सचिन परब
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे. महाराष्ट्राच्या इतिहास आणि भूगोलालाही वळण लावणारी थोर व्यक्तिमत्वं विसाव्या शतकात होऊन गेली, त्यातलं एक महत्त्वाचं नाव. महात्मा फुले यांच्या सत्यशोधनाचा विचार पुढे नेणारे आक्रमक विचारवंत, भिक्षुकशाहीचा कर्दनकाळ ठरलेले समाजसुधारक, हुंड्यासारख्या चालीरितींविरुद्ध उभे ठाकलेले सामाजिक कार्यकर्ते, मराठी पत्रकारितेला नवी दिशा देणारे संपादक, जातनिष्ठ इतिहासलेखनाचा फोलपणा दाखवून इतिहासाची नवी मांडणी करणारे इतिहासकार, महाराष्ट्रभर सातत्याने फिरून विद्रोहाची पेरणी करणारे ज्वलंत वक्ते, समाज सुधारणांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारे नाटककार, दिग्दर्शक आणि निर्मातेही, मोजक्याच पण ठसकेबाज भूमिका करणारे लक्षवेधी अभिनेते, सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे संस्थापक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे गुरुतुल्य मार्गदर्शक, संयुक्त महाराष्ट्र प्रत्यक्षात आणण्यासाठी वयाच्या सत्तरीत तुरुंगवास भोगणारे आंदोलनाचे नेते, गेल्या अर्धशतकापेक्षाही जास्त काळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या ठाकरे कुटुंबाचे प्रेरणास्थान, याशिवाय लेखक, कवी, संगीतकार, सतारवादक, चित्रकार, फोटोग्राफर, शिक्षक, उद्योजक, विक्रेते, जनसंपर्क अधिकारी अशा विविध भूमिकांत वावरलेल्या अफाट बहुआयामी व्यक्तिमत्वाचं कर्तृत्व शब्दांत पकडणं कठीण आहे.
संस्कार आणि बालपण
प्रबोधनकारांची जन्मतारीख १७ सप्टेंबर १८८५. जन्मगाव पनवेल. पण ठाकरेंचं मूळ गाव पाली. अष्टविनायकांमधल्या बल्लाळेश्वर गणपतीचं पाली. हे ठाकरेंचं कूलदैवत असल्याचा उल्लेख आहे. आजोबा भिकोबा धोडपकर देवीभक्त साधुपुरुष होते. पण आधुनिक शाक्तांचा सिद्धींच्या मागे लागून आलेला माणूसघाणेपणा त्यांच्याकडे नव्हता. उलट बावीस वर्ष केलेल्या पंढरीच्या वारीमुळे निस्पृह लोकसेवेचं व्रत त्यांनी पाळलं.
त्या काळात काही लोकांनी पैसे कमावण्यासाठी प्लेगदेवी बनवली होती. ती रेड्यावर बसून गावोगाव फिरून पैसे गोळा करायची. भिकोबा म्हणजे तात्या अंगण झाडताना ती समोर आली. त्यांनी हातातला खराटा फक्त जमिनीवर आपटला आणि ती प्लेगदेवी पोटात मुरडा आला म्हणून गयावाया करू लागली. प्रबोधनकारांवर अंधश्रद्धेवर प्रहार करण्याचे संस्कार तेव्हाच होत होते. तात्या एकदा काशीला गेले होते. दक्षिणा दिली नाही, तर तुमचे पूर्वज नरकात जातील, अशी धमकी तिथल्या पंड्याने दिली. त्यावर तात्यांनी खड्ड्यात गेलं तुझं श्राद्ध म्हणत फटकारलं. आमच्या पूर्वजांच्या स्वर्ग नरकाच्या किल्ल्या तुझ्या हातात आहेत का, असा त्यांनी तेव्हा विचारलेला प्रश्न प्रबोधनकारांना अंधश्रद्धेबरोबरच भिक्षुकशाहीवरही प्रहार करण्याचे संस्कार करून गेला. त्यांच्या आईचे वडील बाबा पत्की हे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ. पण त्यांचा पिंड शिवोपासनेचा आणि जनसेवेचा. सध्या पनवेलच्या आधी ट्रान्सहार्बर लोकल रेल्वे लाइनवरचे एक स्टेशन लागतं, खांदेश्वर. त्या खांदेश्वराची स्थापना बाबांनीच केलेली. ‘देवळाचा धर्म की धर्माची देवळं? ’ असा प्रश्न विचारणाऱ्या प्रबोधनकारांनी रॅशनॅलिझम आणि श्रद्धा याचा तोल सांभाळला, तो या बालपणीच्या प्रभावामुळे होता. त्यांनी श्रद्धेची सालटी काढली पण ते कोरडे अश्रद्ध कधीच झाले नाहीत.
या दोघांपेक्षाही अधिक प्रभाव टाकणारी व्यक्ती म्हणजे बय म्हणजे आजी. वडिलांची आई. तिनं जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन साठ वर्ष सुईणीचं काम केलं. मी जन्मभर जातपात आणि हुंड्याचा विरोध केला, त्याची प्रेरणा ही बयच, असं प्रबोधनकार म्हणतात. शाळेतून परतताना एका महाराची सावली छोट्या केशवच्या अंगावर पडली. आता ठाकरे विटाळला, असं सोबतची ब्राह्मण मुलं ओरडू लागली. ते बयने ऐकलं. त्याच्यातल्याच अभ्यंकर नावाच्या मुलाला पुढे ओढलं. त्याची सावली केशववर पाडली. महाराच्या सावलीने महार होतो, तर ब्राह्मणाच्या सावलीने आमचा दादा ब्राह्मण झाला.
पुढे गावात एक महार जातीचे सुभेदार राहायला आले. इंग्रजी पाचवीत असलेले प्रबोधनकार त्यांच्या घरी जाऊन चहा पित. त्यामुळे गावात वादळ उठलं. तक्रार घेऊन येणाऱ्यांना वाटेला लावलं. म्हणाली, `माणसाच्या हातचा चहा पिण्यात धर्म कसा बुडतो? चहाच्या कपात बुडण्याइतका आपला धर्म म्हणजे काय टोलेगंड्याची कवडी आहे वाटतं?` इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो, असं बलिप्रतिपदेला महार समाजातल्या महिला आरोळी ठोकत. तेव्हा त्यांना ठाकरेंच्या घरात ओटीवर रांगोळीच्या पाटांवर बसवून आणि दिव्याने ओवाळलं जात असे. मगच त्यांना त्यांची दिवाळी देण्यात येत असे. हे संस्कार खूप महत्त्वाचे होते. बय तिच्या उतारवयात दादरला वस्तीला असताना वारली, तेव्हा सगळ्या जातींचे हिंदू तसंच मुसलमान आणि ख्रिश्चनही खांदा द्यायला आले होते.
वडील सीतारामपंत उर्फ बाळा असेच सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारे. नोकरी गेली तरी न घाबरता हरहुन्नरीपणा जपत छोटे उद्योगधंदे केले. त्याचा प्रभाव प्रबोधनकारांवर मोठा होता. नऊ ते पाच मध्यमवर्गीय पांढरपेशा परोपजीवीपणाला त्यांनी आय़ुष्यभर चाट दिली. अनेक उद्योग केले, त्याचं मूळ सीतारामपंतांच्या शिकवणीत. गावात आग लागली की सगळ्यात आधी सीतारामपंतच सर्वस्व विसरून धावून जायचे. गावात प्लेग आला. तेव्हाही असेच धावून गेले. पण प्लेगने त्यांनाच गाठलं. वडील वारले तेव्हा प्रबोधनकार अवघे सोळा सतरा वर्षांचे होते.
पण वडिलांपेक्षाही आईचा प्रभाव मोलाचा होता. तिने अभ्यासाचे आणि स्वाभिमानाचे संस्कार दिले. वडिलांना ल़ॉटरी लागली. तेव्हा १५ रुपये पगार असताना लॉटरी ७५ रुपयांची होती. आपल्याला कष्टाचीच भाकरी हवी, असं आई म्हणाली. राजकीय कार्यकर्ते म्हणून हरामाचे हप्ते मागणा-यांना हे कोण सांगणार? आईनेच त्यांना वाचनाची, विशेषतः वर्तमानपत्र वाचायची सवय लावली. त्यातून मराठी पत्रकारितेला नव्याने घडवणारा संपादक जन्माला आला.
ठाकरेंची जात सीकेपी म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू. लहानपणी एखाद्या ब्राह्मण शाळूसोबत्याच्या घरी पाणी मागितलं की तो पाणी तपेलीतून आणायचा, ओटीच्या खाली उभा ठेवून ओंजळीत ओतायचा. मित्राची आई ती तपेलीही न धुता आत घेऊ द्यायची नाही. सुरुवातीला प्रबोधनकारांना हे कळायचं नाही. कळायला लागलं तेव्हा त्यांनी सोवळेपणाची टिंगल उडवायला सुरुवात केली. ती जन्मभर उडवली.
वडिलांच्या कचेरीतल्या मंडळींनी एका ब्राह्णण बेलिफाच्या घरी धुंदूरमासानिमित्त प्रातर्भोजनाचा कार्यक्रम होता. वडिलांसोबत केशवही गेला होता. तेव्हा ब्राह्मणांची एक पंगत. दुसरी या दोन ठाकरेंची. तर भालेराव नावाचे आणखी एक कारकून तिसरीकडेच बसला. वाढणाऱ्या बायका वरून टाकत. जेवण झाल्यावर वडील दोघांचे खरकटे स्वतःच स्वच्छ करू लागले, तेव्हा केशव चिडला. हे ब्राह्मण आपल्याशी निराळेपणाने वागतात तर आपण त्यांना आपलेपणाने का वागवायचे, असा त्याचा सवाल होता. तेव्हा त्याचं वय होतं अवघं आठ वर्षं.
जीवनभर संघर्ष
वडिलांची नोकरी सुटल्यामुळे आणि पनवेलात पुढचं शिक्षण नसल्यामुळे शिक्षण थांबलं. त्यामुळे कधी बारामती तर कधी मध्य भारतातलं देवास अशी धावाधाव झाली. फीसाठी दीड रुपया कमी पडला म्हणून मॅट्रिकची परीक्षा देत आली नाही आणि वकील बनण्याचं स्वप्न अपुरं राहिलं. तेव्हापासून साईनबोर्ड रंगवणं, रबरी स्टॅम्प बनवणं, बुकबायडिंग, भिंती रंगवणं, फोटोग्राफी, मशीन मेकॅनिक असे उद्योग सुरू केले. हुन्नर असेल तर बेकारी कशाला, हे जगण्याचं ब्रीदच होतं.
कधी नाटककंपनी, सिनेमाकंपनीत कामं केली. कधी गावोगाव फिरून ग्रामोफोन विकले. कधी विमा कंपनीत मार्केटिंगवाले बनले. कधी शाळेत शिकवलं तर कधी इंग्लिश स्पीकिंगचे क्लास चालवले. खासगी कंपन्यांमधे सेल्समन आणि पब्लिसिटी ऑफिसर म्हणून तर ते विख्यात होते. कधी पत्रकारांना वक्त्यांची भाषणं उतरवून देण्याचं काम केलं तर कधी निवडणुकीतील उमेदवारांना जाहिरनामे लिहून दिले. पीडब्ल्यूडी म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्यात शॉर्टहँड टायपिस्ट ते रेकॉर्ड सेक्शनचे हेडक्लार्क अशी दहा वर्षं सरकारी नोकरीही केली. तेवढाच थोडा स्थैर्याचा काळ. नाहीतर संपूर्ण आयुष्य संघर्ष धावपळ सुरूच होता.
नाटककंपनीत असताना मंजुळा गुप्तेंशी लग्न झालं. वर्षं होतं, जानेवारी १९१० आणि ठिकाण अलिबागजवळचं वरसोली गाव. दादरला बिऱ्हाड टाकलं ते वांद्र्याला मातोश्री बंगल्यात जाईपर्यंत. पण ते विंचवाचंच होतं. कधी भिवंडी तर कधी अमरावती अधी संसाराची धावपळ सुरूच होती. त्यांनाना एकूण दहा मुलं. चार मुलगे आणि सहा मुली. शिवाय रामभाऊ हरणे आणि विमलताई यांना पोटच्या मुलांसारखंच वाढवलं. बाळासाहेब मार्मिकनंतर स्थिर झाले, तेव्हा अगदी उतारवयात जगण्यासाठीचा संघर्ष थांबला.
हुंडा विध्वंसक संघ
प्रबोधनकारांची पहिली चळवळ इंग्रजी शाळेत असतानाची. गाडगीळ नावाचे उत्तम शिकवणारे अपंग शिक्षक होते. त्यांना हंगामी म्हणून काढून टाकण्यात आले. त्यासाठी इंग्रजी पाचवीत शिकणाऱ्या केशवने विद्यार्थ्यांच्या सहीचा अर्ज म्युन्सिपाल्टीला केला. आणि त्यांची नोकरी वाचवली.
अगदी लहान असतानाच जरठबाला विवाहात जेवताना ‘मुद्दामहून म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान’ हे पद गात असत. आपल्याच वयाच्या म्हणजे दहा बारा वर्षांच्या मंजू या बालमैत्रिणीचे लग्न पासष्ट वर्षांच्या म्हाताऱ्याशी लावलं म्हणून लग्नाचा मांडव त्यांनी पेटवून दिला होता.
प्रबोधन सुरू असताना दादरलाच खांडके बिल्डिंगमधे स्वाध्यायाश्रमाला सुरूवात झाली. प्रबोधनच्या अंकांच्या पॅकिंगसाठी महिन्यातून दोनदा अनेक तरुण रात्र जागवीत. हे सगळे प्रबोधनकारांच्या मुशीत तयार झाले. त्यातून स्वाध्याय आश्रम आणि गोविंदाग्रज मंडळ सुरू झालं. या संस्थांनी व्याख्यानं, पुस्तक प्रकाशनं तर केलीच, पण हुंडा विध्वंसक संघाचं काम मोठ्या प्रमाणात केलं. हुंडा घेऊन लग्न होत असेल तिथे हे तरुण निदर्शनं करत. गाढवाची वरात काढत आणि हुंडा परत द्यायला भाग पाडत. विशेष म्हणजे यात तयार झालेले अनेक कार्यकर्ते पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत सुरुवातीच्या काळात आघाडीवर राहिले.
महिला उत्थानाच्या कामात प्रबोधनकार नेहमीच आघाडीवर राहिले. महिलांच्या शिक्षणासाठी ते आग्रही होतेच. गोव्यातली देवदासी पद्धत कायद्याने बंद व्हावी म्हणून तिथल्या गवर्नर जनरलला पहिलं निवेदन दिलं गेलं ते प्रबोधनकारांच्याच नेतृत्वात. प्रबोधनकारांनी वीस पंचवीस विधवा विवाहही लावून दिले होते.
ब्राम्हणेतर आंदोलन
प्रबोधनकारांना व्यसन एकच बुकबाजीचं. आधीच पिंड चळवळ्या. क्रांतिकारी विचारांचे संस्कार घरातूनच झालेले. त्यात लोकहितवादी, महात्मा फुले, आगरकर आणि इंगरसॉल यांच्या वाचनाने मांड पक्की झाली. त्यात राजवाडे प्रकरण उद्भवलं.
भारतीय इतिहास संशोधन मंडळाच्या चौथ्या वर्षाचा अहवाल लिहिताना इतिहासाचार्य वि. का. राजवाडेंनी मराठेशाहीच्या ऱ्हासासाठी ब्राम्हणेतरांना, विशेषतः कायस्थांना जबाबदार धरलं होतं. मात्र सत्य तसं नव्हतंच. इतिहाससंशोधनाच्या नावाने सत्य दडपून ब्राह्मणेतरांचा स्वाभिमान पायदळी तुडवण्याचे प्रकार पेशवाईपासून सातत्याने घडतच होते. राजवाडेंच्या इतिहाससंशोधनातल्या तपश्चर्येची इतकी दादागिरी होती, की त्याला विरोध करण्यात कुणीच समोर येत नव्हतं. अशावेळेस कसाबसा तेहतीस वर्षांचा एक तरुण शड्डू ठोकून उभा राहिला. प्रबोधनकार मैदानात उतरले. त्यांनी ‘कोदण्डाचा टणत्कार अर्थात भारतीय इतिहास संशोधन मंडळास उलट सलामी’ असा तडाखेबंद ग्रंथ लिहिला. त्यात मराठेशाहीतलं ब्राह्णणेतरांचं उज्ज्वल कार्य आणि ऱ्हासाला कारणीभूत ठरलेला ब्राम्हणांचा जातीयवाद याचं उत्तम विवेचन होतं. हे सारं इतकं साधार होतं, की राजवाडे त्याला उत्तरही देऊ शकले नाहीत. ब्राम्हणवादी इतिहासपद्धतीला त्यामुळे खीळ बसली आणि नव्या बहुजनकेंद्री इतिहासलेखनाचा पायंडा पडला.
फक्त पुस्तक लिहून प्रबोधनकार शांत बसले नाहीत. ते त्याच्या प्रसारासाठी महाराष्ट्रात नागपूरपासून बेळगावपर्यंत गावोगाव फिरले. त्यात ते ब्राम्हणेतर चळवळीकडे आकर्षिले गेले. ब्राम्हणेतरांचं वैचारिक नेतृत्वाची पोकळी भरून काढत त्यांनी महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ नव्याने उभी करण्यात मोठं योगदान दिलं. पुढे सातारा गादीचे शेवटचे छत्रपती प्रतापसिंह यांची तत्कालीन ब्रिटिशधार्जिण्या ब्राम्हण सरदारांनी केलेली विटंबना आणि त्यात त्यांचा झालेला शेवट याची कहाणीही त्यांनीच पुढे आणली. त्यातून पश्चिम महाराष्ट्रात ब्राम्हणेतरी आंदोलनाला प्रेरणा मिळाली.
विशेषतः त्यांच्या पुण्यातल्या वास्तव्यात त्यांच्या कार्याला तेज आलं. केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर या तरुणांसोबत प्रबोधनकार आल्यामुळे ब्राम्हणवादी चळवळे गांगरून गेले. लोकमान्य टिळकांचे सुपुत्र श्रीधरपंत आणि रामभाऊ यांनी गायकवाड वाड्यातल्या गणपतीत अस्पृश्यांचे मेळे नेले. तिथेच समता सैनिक संघाची स्थापना झाली. जातिभेद मोडून एकत्र पंगती मांडल्या गेल्या. यामागे एक महत्त्वाची प्रेरणा प्रबोधनकारांचीच होती. त्यामुळे त्यांच्यावर बहिष्कार, धमक्या, जीवघेणा हल्ला, मेलेलं गाढव आणि कुत्री घरासमोर टाकणं, मृत्यूच्या खोट्या अफवा उठवणं असा त्रास झाला. पण ते त्याला पुरून उरले.
छत्रपती शाहू महाराजांचा कोदंड
या काळात ब्राम्हणेतर आंदोलनाचं नेतृत्व छत्रपती शाहू महाराज करत होते. प्रबोधनकारही व्याख्यानं देत गावोगाव हिंडत होते. शिवाय ठिकठिकाणच्या कागदपत्रांत ग्रामण्याचा इतिहास शोधत होते. वेदोक्त प्रकरणात ब्राम्हणी वर्तमानपत्रांची टीकेला जशास तसं उत्तर देण्यासाठी महाराजांनाही एक कलमबहाद्दर हवाच होता. या दोन महापुरुषांत पहिल्याच भेटीत अखंड स्नेह निर्माण झाला. वेदोक्त पुराणोक्त वाद असो की क्षात्रजगद्गुरु पीठाची स्थापना असो, प्रबोधनकारांनी पुरवलेल्या ऐतिहासिक दाखल्यांमुळे छत्रपतींना खूपच मदत झाली.
२१ साली प्रबोधनकारांना टायफॉइड निमोनिया झाला होता. तीन महिने आजार लांबल्यामुळे दर महिन्याचा पगार येत नव्हता. पैशाची अडचण होती. अशावेळेस एक वकील शाहू महाराजांचं पत्र घेऊन आले. एका विषयावर पुराणांच्या आधारे ग्रंथ लिहिण्यासाठी पाच हजारांचा चेक त्यात होता. पण त्यावर प्रबोधनकारांचं उत्तर होतं, ‘पुराणे म्हणजे शिमगा, असं माणसारा मी आहे. छत्रपतींसारखा नृपती असे भलभलते विषय कसे सुचवतो. एखादी जात श्रेष्ठ ठरवल्याने. आपली जात कनिष्ठ ठरत नाही. मी थुकतो या चेकवर.’ ही छत्रपतींनी घेतलेली परीक्षा होती. ‘ ही इज द ओन्ली मॅन वुई हॅव कम अक्रॉस हू कॅन नॉट बी बॉट ऑर ब्राइब्ड’, असं सर्टिफिकेट महाराजांनी दिलं ते त्यामुळेच.
छत्रपतींचं चुकलं तिथे प्रबोधनकारांनी घणाघाती टीकाही केली. प्रबोधनच्या दुसऱ्याच अंकात त्यांनी ‘अंबाबाईचा नायटा ’ हा स्फोटक लेख लिहिला. काही मराठा मुलांनी अंबाबाईची देव्हाऱ्यात जाऊन पूजा केली होती. त्याबद्दल त्या मुलांना शाहूंनी शिक्षा केली होती. त्यामुळे प्रबोधकरांच्या लेखणीचा प्रसाद चाखवा लागला. क्षत्रिय शंकराचार्य बनवण्याविषयीही प्रबोधनकारांनी छत्रपती शाहूंवर टीका केली होती.
असं असलं तरी छत्रपती शाहूंनी प्रबोधनकारांवरचा लोभ तसाच ठेवला. एका रात्री दादर भागात एक गाडी कोदंडाला शोधत फिरत होती. शाहू महाराज प्रबोधनकारांना कोदंड म्हणून हाक मारत. महाराजांची माणसं प्रबोधनकारांकडे आली आणि शाहू महाराजांकडे घेऊन गेली. खूप रात्र झाली होती. महाराज आजारी होते. छत्रपती प्रतापसिंह आणि रंगो बापूजी यांचा इतिहास लिहेनच, अशी शपथ छत्रपतींनी आपल्या हातावर हात ठेवून घ्यायला लावली. सकाळी महाराजांच्या मृत्यूची बातमी आली.
प्रबोधनची पत्रकारिता
लहानपणी पनवेलला असतानाच प्रबोधनकारांना पॉकेट एनसाक्लोपेडिया नावाचं एक छोटं पुस्तक सापडलं. त्यातल काही माहितीपर भाग भाषांतर करून त्याकाळी लोकप्रिय असलेल्या ह. ना. आपटेंच्या ‘करमणूक’ मध्ये पाठवला. तो छापण्यात आला. हरिभाऊंनी पत्र पाठवून आणखी लेख मागवले. आणि प्रबोधनकारांच्या लिखाणाला सुरूवात झाली. केरळकोकीळकार कृष्णाजी नारायण आठल्ये यांनी पनवेलमुक्कामी लेखन आणि पत्रकारितेचे संस्कार प्रबोधनकारांवर केले. त्याआधी शाळेत असतानाच ‘विद्यार्थी’ नावाचं एक साप्ताहिक सुरू केलं होतं. त्यासाठी एक घरगुती छपाई यंत्रही बनवलं. एका आठवड्याला पन्नास अंक छापले. चार पाच महिने चालवलं. पण प्रत्यक्षात त्यांच्या हाताला शाई लागली ती मुंबईच्या ‘तत्त्वविवेचक’ छापखान्यात. १९०८ च्या सुमारास ते तिथं असिस्टंट प्रुफरिडर होते. तिथे असतानाच ते विविध ठिकाणी टोपण नावांनी लिहित. तर नावाने ‘इंदुप्रकाश’ आणि ठाण्याचं ‘जगत्समाचार’ या वृत्तपत्रांत लिहित होते. त्यानंतर त्यांनी जळगाव इथे ‘सारथी’ हे मासिक वर्षभर चालवलं.
पण त्यांच्या लेखणीला खरा बहर आला तो ‘प्रबोधन’मुळे. १६ ऑक्टोबर १९२१ रोजी हे पाक्षिक सुरू झालं. ब्राम्हण ब्राम्हणेतर वादात नव्या वादांना जन्म देण्यासाठी आणि आक्षेपांना उत्तर देण्यासाठी त्यांना स्वतःच्या मालकीचं नियतकालिक हवं होतं. A fortnightly Journal devoted to the Social, Religious and Moral Regeneration of the Hindu Society, असं ध्येय असणाऱ्या प्रबोधनला राजकारणाचं वावडं मुळीच नव्हतं. त्याकाळात सरकारी नोकराला स्वतःचं मासिक काढता येत नसे. पण आपल्या कामात अतिशय वाकबगार असलेल्या प्रबोधनकारांना ब्रिटिश सरकारने प्रबोधन काढण्याची विशेष सवलत दिली. पण आपल्या मतस्वातंत्र्याचा संकोच होतोय, असं वाटल्यावर त्यांनी लवकरच सरकारी नोकरीचा राजीनामा दिला.
सामाजिक सुधारणांना पांढरपेशा समाजाच्या पुढे नेत बहुजनसमाजापर्यंत पोहोचवणारं प्रबोधन आगरकरांच्या ‘सुधारक’च्याही काही पावलं पुढे गेलेलं होतं, असं मराठी वृत्तपत्रांचा इतिहास लिहिताना रा. के. लेले सांगतात. प्रबोधनकारांच्या शैलीविषयी ते म्हणतात, ‘त्यांच्या वाणीच्या आणि लेखणीच्या शैलीला महाराष्ट्रात जोड सापडणे कठीणच! त्यांचा नुसता टोला नव्हे, तर सणसणीत प्रहार असे. वाचणाऱ्याच्या अंगाचा तिळपापड व्हावा अशी त्यांची भाषा असे. पण ती अधिक बाळबोध, सोपी आणि अस्सल मराठमोळा वळणाची होती.’
महाराष्ट्रावर ‘प्रबोधन’चा खप आणि प्रभाव प्रचंड होता. त्याने आपल्या अवघ्या पाच सहा वर्षांच्या कालावधीत बहुजनवादी पत्रकारितेला मान्यता, वलय आणि विचारांचं प्रौढत्व मिळवून दिला. त्यामुळे ‘प्रबोधन’ बंद पडल्यानंतरही प्रबोधनकार हे बिरुद त्यांच्यामागे नावासारखं सन्मानानं येऊन चिकटलं. हाच वसा पुढे नेण्यासाठी त्यांनी पुण्यात असताना ‘लोकहितवादी’ नावाचं साप्ताहिकही वर्षभर चालवलं.
‘प्रबोधन’ बंद पडल्यानंतर त्यांनी स्वतःचं पत्र काढलं नाही. पण ते सतत लिहित राहिले. मालती तेंडुलकरांच्या ‘प्रतोद’चे ते वर्षभर संपादक होते. ‘कामगार समाचार’ पासून ‘कंदिल’पर्यंत आणि ‘विजयी मराठा’ पासून ‘किर्लोस्कर’पर्यंत अनेक नियतकालिकांत ते लिहित राहिले. ‘नवा मनू’ मधील ‘तात्या पंतोजीच्या घड्या ’, ‘सेवक’मधील ‘शनिवारचे फुटाणे ’, ‘नवाकाळ’मधील ‘घाव घाली निशाणी ’, ‘लोकमान्य’मधील ‘जुन्या आठवणी ’ आणि ‘बातमीदार’मधील ‘वाचकांचे पार्लमेंट ’ अशी त्यांची अनेक सदरं गाजली. शेवटच्या काळात ते प्रामुख्याने ‘मार्मिक’मधून लिहित होते.
कर्मवीरांचे गुरू
ब्राम्हणेतर आंदोलनासाठी सातारा पिंजून काढताना भाऊराव पाटलांशी गाठ पडली. भाऊरावही प्रबोधनकारांप्रमाणेच सेल्समन. ते टायकोट घालून किर्लोस्करांचे नांगर विकायचे. पण बहुजनांना शिक्षण देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेसाठी त्यांनी वाहून घेतलं. त्यांचा कामाचा सर्व आराखडा प्रबोधनकारांसमवेत दादरच्या खांडके बिल्डिंगमधेच तयार झाला. साताऱ्यात नांगरांचा कारखाना सुरू करायचा आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांवर बोर्डिग उभी करायची असा प्लान होता. त्यासाठी उद्योजक खानबहाद्दूर धनजी कूपर यांनी पाडळी येथे कारखाना सुरू केला. तिथेच छापखाना सुरू करण्यासाठी प्रबोधनकारही पोहोचले. पण या कारखान्यातून ना बोर्डिंगला पैसे मिळाले ना ‘प्रबोधन’ दीर्घकाळ छापता आलं.
कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कामाला जेव्हा कधी अडचण आली तेव्हा प्रबोधनकार उभे राहिले. बोर्डिंगमधल्या मुलांसाठी घरोघर जाऊन धान्यही मागितलं. ‘रयत शिक्षणाची कल्पना माझी असली तरी त्या बीजाला चैतन्याचे, स्फूर्तीचे नि उत्साहाचे पाणी घालून त्याला अंकुर फोडणारे आणि सुरुवातीच्या काळात धीर देऊन विरोधाचे पर्वत तुडवण्याचे मार्ग दाखवणारे माझे गुरू फक्त प्रबोधनकार ठाकरे. ते माझे गुरू तर खरेच. पण मी त्याना वडिलांप्रमाणे पूज्य मानतो’, असं कर्मवीरांनी प्रबोधनकारांविषयी म्हटलंय. आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते खऱ्या अर्थाने कोण असेल तर कर्मवीरच. असा माणूस प्रबोधनकारांना गुरू मानतो, हे महत्त्वाचं.
प्रबोधनकार भाऊरावांसोबत अस्पृश्य बोर्डिंगसाठी हरिजन फंडातून पैसे मिळवण्यासाठी गांधीजींकडेही गेले होते. टिळकवाद्यांचं वर्चस्व मोडून काढणारा महात्मा म्हणून प्रबोधनकारांना गांधीजींचं कौतुकही होतं. पण त्यांनी गांधीजींना वेळोवेळी ठोकूनही काढलंय. ‘आपण म्हणता आयाम ए बेगर विथ बाऊल. आपण बेगर तर खरेच, पण रॉयल बेगर आहात नि भाऊराव रियल बेगर आहेत,’ असं गांधीजींना सडेतोड सांगत त्यांनी भाऊरावांसाठी वर्षाला हजार रुपये देणगी मिळवली. पुढे दोन वर्षांनी अकोल्याला गांधीजींची सभा होऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या सत्याग्रहींना टोलवत गांधीजींना सुखरूप सभास्थानी पोहोचवण्याचा पराक्रमही घडवून आणला होता. फार नंतर गांधीजींना महात्माऐवजी मिस्टर असं संबोधन लावण्याचा आग्रह होता, म्हणून त्यांनी नथुराम गोडसेच्या ‘अग्रणी’ मासिकात लिहिणं सोडून दिलं.
सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे प्रणेते
पुण्याहून मुंबईतला परतल्यावर त्यांनी १९२६ सालचा दादरचा गणपती गाजवला. तिथे अस्पृश्याच्या हातून गणपतीची पूजा व्हावी यासाठी बहुजन समाजाचे नेते आग्रह धरून होते. पण गणपती मंडळाचे ब्राम्हण पुढारी ऐकायला तयार नव्हते. मार्ग काढला नाही तर मी गणपती फोडून टाकेन, असा बॉम्ब प्रबोधनकारांनी टाकला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रावबहाद्दूर बोले यांच्या मध्यस्थीमुळे दलित नेते मडकेबुवांच्या हातची फुलं ब्राह्मण पुजारी प्रत्यक्षात देवाला वाहील, असा मार्ग निघाला. पण पुढच्या वर्षीपासून दादरचा गणेशोत्सव बंद पडला.
ठाकऱ्यांनी गणपती बंद पाडला अशी हाकाटी झाली. म्हणून मग सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात केली. गुजराती गरबे आणि बंगाली दुर्गापूजा हे आधीपासून असतीलही, पण मूर्ती आणून देवीची महाराष्ट्रीय पद्घतीची नवरात्री सुरू करण्याचं श्रेय प्रबोधनकारांचंच. त्यांनी शिवकालात असा उत्सव पूर्वी असायचा पण पेशवेकाळात बंद पडला, असे दाखले दिले होते. ‘लोकहितवादी संघ’ ही संस्था स्थापन करून दादरला आजच्या टिळक पुलाजवळच्या एका मैदानात हा उत्सव साजरा झाला. त्याला पालघरपासून कुलाब्यापर्यंतच्या ब्राम्हणेतरांनी जोरदार प्रतिसाद दिला. पुढच्या वर्षी तो महाराष्ट्रभर पसरला. आजही प्रबोधनकारांनी सुरू केलेला उत्सव खांडके चाळीत सुरू आहे.
बहुजनवादी हिंदुत्वाचा मूळपुरुष
हिंदुत्ववाद आणि बहुजनवाद याचा समन्वय साधण्याच्या अचाट कामाचं श्रेय प्रबोधनकारांकडे जातं. हिंदुत्वाच्या बुरख्यात ब्राम्हणी फायदा लाटण्याला त्यांनी कडाडून विरोध केला. ते स्वतः हिंदुत्ववादी होते, पण त्यांचा पाया बहुजनवादाचा होता. त्यांना बहुजनवादी हिंदुत्वाचा मूळपुरूष मानायला हवं. ब्राह्मणेतर आंदोलनातले काँग्रेसकडे न गेलेले अनेक मोठे नेते न. चिं. केळकर आणि सावरकरांच्या प्रभावामुळे हिंदुमहासभेकडे गेले. पण प्रबोधनकारांचा बाणा कायम स्वतंत्रच राहिला. ते काँग्रेस आणि हिंदुमहासभेपासून समान अंतर राखून राहिले.
प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाचा पाया गजाननराव वैद्य यांच्या हिंदू मिशनरी सोसायटीत घातला गेला. सोसायटीने धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदूधर्मात आणण्याचं काम केलं. पण वैद्य आणि त्यांचे अनुयायी ब्राम्हणेतर असल्यामुळे हिंदुत्ववाद्यांनी त्यांच्याकडे कायम दुर्लक्ष केलं. प्रबोधनकार यांनी हिंदू मिशनरी म्हणून काही वर्ष प्रचार केला. गावोगाव व्याख्यानं दिली. नागपूरच्या हिंदू मिशनरी परिषदेचे ते अध्यक्षही होते. वैद्यांनी तयार केलेल्या वैदिक विवाह विधीचं त्यांनी संपादन केलं. अनेकांच्या लग्नात नव्या विधीनुसार पौरोहित्य केलं. आजही वैदिक विवाह विधी प्रसिद्ध आहे.
हिंदू धर्मातील अंधश्रद्ध परंपरांवर आणि आद्य शंकराचार्यांपासून लोकमान्य टिळकांपर्यंत हिंदुत्ववाद्यांच्या आदर्शांवर घणाघात, तसंच ब्राह्मणेतर आंदोलनाचं नेतृत्व त्यांच्या दृष्टीने हिंदुत्ववादाचाच एक भाग होता. मुस्लिम तसंच ख्रिश्चनांवर त्यांनी पूर्वग्रहातून आरोप केलेलेही कुठेच आढळत नाहीत. त्यांचा हिंदुत्ववाद दलितांच्या विरोधात नव्हताच, उलट तो दलितांची बाजू घेऊन लढत होता. बुद्धधर्माविषयी त्यांनी फार प्रेमाने लिहिलंय. शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराची बाजूही त्यांनी घेतलेली दिसते.
महत्त्वाचं वाङ्मय
‘वक्तृत्वशास्त्र’ (१११९) हे प्रबोधनकारांचं पहिलं महत्त्वाचं पुस्तक मानायला हवं. अशा विषयावरचं ते भारतीय भाषांमधलं पहिलं पुस्तक असावं. खुद्द लोकमान्य टिळकांनी याचं कौतूक केलं होतं. पण त्यानंतर काही महिन्यांत त्यांनी ‘लाईफ अँड मिशन ऑफ रामदास ’ (१९१९) हे संत रामदासांचं इंग्रजी चरित्र लिहिल्याचा उल्लेख आहे. ‘भारत इतिहास संशोधन मडंळाला उलट सलामी म्हणजे कोदण्डाचा टणत्कार’ या पुस्तकाचा उल्लेख पूर्वी आलाच आहे. ‘भिक्षुकशाहीचे बंड’, ‘ नोकरशाहीचे बंड अर्थात ग्रामण्याचा साद्यंत इतिहास’, ‘दगलबाज शिवाजी’ अशा पुस्तकांनी इतिहासाची, तर ‘शनिमहात्म्य’, ‘धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म’, ‘हिंदू धर्माचे दिव्य’, ‘हिंदू धर्माचा ऱ्हास आणि अधःपात’ अशा पुस्तकांनी धर्माची परखड चिकित्सा केली. `रंगो बापूजी`, ‘पंडिता रमाबाई सरस्वती’, ‘श्री संत गाडगेबाबा’, ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांचे अल्पचरित्र’ हे त्यांचं चरित्रपर लेखन.
‘माझी जीवनगाथा’ हे त्यांचं आठवणीपर आत्मचरित्र आज विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज बनलाय. त्यांच्या पूर्वप्रकाशित लेखांचे संग्रह आणि पुस्तिकाही बऱ्याच आल्या. त्यांनी शाहीर बनून लिहिलेले दोन पोवाडेही पुस्तिका रुपाने पाहायला मिळतात. ‘स्वाध्याय संदेश ’ आणि ‘उठ मऱ्हाठ्या उठ’ हे महत्त्वाचे लेखसंग्रह. ‘खरा ब्राम्हण’, ‘टाकलेलं पोर’, ‘संगीत विधिनिषेध’, ‘काळाचा काळ’, ‘संगीत सीताशुद्धी’ या त्यांच्या नाटकांनीही इतिहास घडवला. शिवाय त्यांनी सिनेमेही लिहिले. ‘श्यामची आई’, ‘महात्मा फुले’ आणि ‘माझी लक्ष्मी’ या आचार्य अत्रेंच्या सिनेमात त्यांनी अभिनयही केला.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलन
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, भाई माधवराव बागल, ‘प्रभात’कार वा. रा. कोठारी आणि सेनापती बापट या ज्येष्ठ नेत्यांना संयुक्त महाराष्ट्राचे पंचायतन म्हटले गेले. हे कोणत्याही पक्षात नव्हते. त्यांनी स्वतंत्रपणे संपूर्ण आंदोलनावर वचक ठेवला. हे आंदोलन लढलं जात असताना प्रबोधनकार सत्तरीच्या जवळ होते. पण त्यांनी व्याख्यानांचा धुरळा उडवला. त्यांची लेखणी तर बेडरपणे चालत होती. त्यात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घेतलेली मुलाखत महत्त्वाची ठरली. पक्षभेद विसरून एकत्र आला नाहीत, तर काँग्रेस मुंबईसह महाराष्ट्र कधीच देणार नाही, हा बाबासाहेबांनी दिलेला इशारा कळीचा ठरला. त्यानंतर सगळे विरोधी पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत एकत्र आले आणि महाराष्ट्र घडला. या आंदोलनातल्या सक्रिय सहभागासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यानंतर प्रबोधनकारांनी सर्व सार्वजनिक चळवळींचा राजीनामा दिला.
आणि शिवसेना
एका सार्वजनिक नवरात्रौत्सवात झेप घेणाऱ्या वाघाचं प्रबोधनकारांनी काढलेले भव्यदिव्य चित्र छोटे बाळ आणि श्रीकांत पाहत होते. प्रबोधनच्या एका अंकाच्या मुखपृष्ठावरही तो आला. पुढे जाऊन तो वाघ जसाच्या तसा शिवसेनेचं बोधचिन्ह बनला. फक्त हे बोधचिन्हच नाही तर शिवसेना आणि मार्मिक ही नावं, जय महाराष्ट्र हे घोषवाक्य, ज्वलंत मराठी अभिमानाची पताका आणि बहुजनी हिंदुत्ववाद हे सारं मुळात प्रबोधनकारांचंच. बाळासाहेबांनी प्रबोधनकांराचं वाणी, लेखणी आणि कुंचल्याचं कौशल्य उचललं. तर श्रीकांतजींनी त्यासोबत संगीतही घेतलं. आताच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कॅमेराही प्रबोधनकारांकडूनच आलेला.
‘न्यूज डे’ सोडल्यानंतर कार्टूनिस्ट म्हणून गाजणारे बाळासाहेब ‘शंकर्स विकली ’च्या धर्तीवर इंग्रजी साप्ताहिक काढण्याच्या तयारीत होते. प्रबोधनकारांनी सांगितलं नाही. मराठी व्यंगचित्र साप्ताहिक हवं. नावही सांगितलं, ‘मार्मिक’. ‘मार्मिक’ने शिवसेना उभी केली. त्या शिवसेनेला मराठीच्या अभिमानाचा नारा दिला तो प्रबोधनकारांनीच. शिवसेनेचा जन्म होण्याच्या जवळपास पंचेचाळीस वर्षांपूर्वी त्यांनी मुंबईतील परप्रांतीयांच्या लोंढ्यावर प्रबोधनमधे लेख लिहिले होते. एवढंच नाही, तर स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात हे तत्त्व इंग्रज सरकारकडून मान्य करून घेतलं होतं.
२० नोव्हेंबर १९७३ रोजी प्रबोधनकारांचं निधन झालं. तेव्हा शिवसेना मुंबईत सत्तेवर होती. सुधीर जोशी मुंबईचे महापौर होते. त्यांची अंत्ययात्रा ही बाबासाहेब आंबेडकरांनंतरची मुंबईतली सर्वात मोठी अंत्ययात्रा मानली गेली. घराच्या उंबरठ्याबाहेर चपलांचा ढीग, ही आपली संपत्ती आहे, असं मुलांना सांगणारे प्रबोधनकार ८८ वर्षांचं एक समृद्ध आयुष्य जगून समाधानाने थांबले होते.