प्रबोधनकारांवरील पीएचडीचे प्रबंध 

 

विद्यापीठीय संशोधनाच्या पातळीवर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्यावर पीएचडीचे पाच प्रबंध झालेले आहेत. 

१. डॉ. गोपाळ डिवरे यांनी `केशव सीताराम ठाकरे यांची साहित्यिक कामगिरी` या विषयावर अमरावती विद्यापीठातून १९९० ला डॉक्टरेट मिळवली. प्रबोधनकारांवर झालेल्या या पहिल्या पीएचडीचा प्रबंध अजूनही अप्रकाशित आहे. 

२. परभणीच्या प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून `प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे सत्यशोधक चळवळीला योगदान` या विषयावर २००२ ला पीएचडी मिळवली. डॉ. घुले यांनी संपादित केलेले `प्रबोधनकारांचे शनिमहात्म्य` हे पुस्तक २०१५ ला प्रकाशित झालं आहे. त्यांच्या पीएचडीचा प्रबंध `सत्यशोधक प्रबोधनकार ठाकरे` या नावाने पुस्तकरूपाने २०१८ साली प्रकाशित झाला. 

३. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथील डॉ. नवनाथ शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर इथून २००६ ला `प्रबोधनकार ठाकरे यांचे महाराष्ट्रातील सामाजिक विचारांचे योगदान : एक समाजशास्त्रीय अभ्यास` या विषयावर डॉक्टरेट मिळवली. त्याआधीच त्यांनी `सत्यशोधक विचारांची तळपती तलवार प्रबोधनकार ठाकरे` हे पुस्तक लिहिलं होतं. ते आता `प्रबोधनकार ठाकरे : कार्य आणि कर्तृत्व` या नावाने उपलब्ध आहे. शिवाय त्यांच्या पीएचडीचा प्रबंध `प्रबोधनकार ठाकरे : सामाजिक व सांस्कृतिक क्रांतीचा ज्वालामुखी` या नावाने पुस्तकरूपात आलाय. तसंच त्यांनी प्रबोधनकार ठाकर यांच्यावर लिहिलेला एक एकपात्री प्रयोगही पुस्तकांत प्रकाशित झालाय. ते प्रबोधनकारांवरील एकपात्री प्रयोग स्वतः अभिनय करून सादर करतात. 

४. पत्रकार डॉ. अनंत गुरव यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून `केशव सीताराम ठाकरे यांच्या प्रबोधन या नियतकालिकांचा अभ्यास` या विषयावर २०१५ ला पीएचडी केली आहे. हे प्रबोधन नियतकालिकावर झालेले पहिलेच संशोधन आहे. 

५. २०१७ ला डॉ. मनीष देशमुख यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून `केशव सीताराम ठाकरे यांच्या कार्याचे ऐतिहासिक परीक्षण` या विषयावर डॉक्टरेट मिळवली आहे.