छत्रपती शाहू महाराज व प्रबोधनकार ठाकरे
नामदेव ढसाळ
महाराष्ट्राच्या समाजपरिवर्तनाच्या चळवळीतील दोन बिनीचे शिलेदार म्हणजे, छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे. एक सामाजिक समता प्रत्यक्ष राबवणारा रयतेचा राजा तर दुसरा खरा माणूसधर्म ठणकावून सांगणारा लढाऊ विचारवंत. या दोन महात्म्यांच्या ऋणानुबंधावर प्रकाश टाकलाय ज्येष्ठ साहित्यिक नामदेव ढसाळ यांनी...
…
सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील म्हणा अथवा, ब्राह्मणेतरांच्या चळवळीतील - छत्रपती शाहू महाराज व प्रबोधनकार ठाकरे या दोघा महापुरुषांचा ऋणानुबंध अनन्यसाधारण आणि मनस्वी भावनिक गुंत्याचा होता. एक मानवी मूल्याचे अधिष्ठान असलेले रासवट व्यक्तिमत्त्व तर दुसरे वस्तुनिष्ठ सत्याचा अपलाप न करणारे परखड बुद्धिमंतच. एक सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीची नुसती पाठराखण करणारा नव्हे तर स्वराज्यात करवीरनगरीत अस्पृश्योत्थानासाठी प्रत्यक्ष कृती करणारा.
जातपात तोडण्याच्या दृष्टीने स्वत:च्या कोल्हापूर संस्थानात कायदेकानू करून मानवी मूल्य जपण्यासाठी कार्यरत राहणारा. दुसरा आपले सर्वस्व पणाला लावून रूढी, परंपरा, मनुष्याचे अवमूल्यन करणार्या व्यवस्थेविरुद्ध लढणारा बुद्धिमंत - कृतिशील धाडसी समाजसेवक. दोघांचेही योगदान सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले एवढे महत्त्वाचे.
अडचणीच्या वेळी हाक मारताच प्रबोधनकार शाहू महाराजांच्या मदतीला धावून गेले आहेत. त्यांची कृती, उक्ती त्यांच्या बुद्धीला पटल्यानंतरच. सडेतोड सल्ले प्रबोधनकारांनी शाहू महाराजांना दिले आहेत. जिथे पटले नाही तिथे आपले परखड मत व्यक्त करून जाहीर विरोधही केला आहे. अंबाबाईच्या मंदिरात काही मराठी मुले ब्राह्मण पुजार्याचा विरोध डावलून प्रवेश करतात, पूजाअर्चा करतात. पुजार्याच्या तक्रारीवरून महाराजांचे पोलीस त्या मुलांना तुरुंगात डांबतात. ही बातमी ऐकून प्रबोधनकारांना क्लेश होतात.
क्षणाचाही उशीर न लावता आपल्या पत्रकातून ते या कृत्याचा समाचार घेऊन महाराजांवर टीकास्त्र सोडतात. शूद्रातिशूद्रांचा राजा सारासार विवेक हरवून कसा बसतो? महाराजांचा तत्त्वभ्रष्टपणा प्रबोधनकार अजिबात खपवून घेत नाहीत. शाहू महाराज ब्राह्मणेतर चळवळीचे कुलावंतांचे दिग्गज नेते. कधीकधी त्यांच्याकडून वागण्याचा अतिरेक होई. त्यांचे अतीव मराठाजात प्रेम, मराठा अभिनिवेशाचे दर्शन घडवी. अशावेळी महाराजांना प्रबोधनकारांनी आपल्या लेखणीने फटकारले आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या हयातीतच त्यांना ब्राह्मणेतर चळवळीत भविष्यात मराठा जात अभिनिवेशाच्या रूपाने विकृती निर्माण होणार हे दिसत होते.
तसे प्रबोधनकारांनी आपल्या लिखाणातून या विषयक सावधानतेचे इशारेही दिले होते. आज जवळजवळ ऐंशी-नव्वद वर्षांनंतर महाराष्ट्र राज्यात इतर जातींपेक्षा ज्या मराठा जातीची लोकसंख्या जास्त आहे म्हणजे विधिमंडळात त्यांचे लोकप्रतिनिधी जास्त आहेत, त्या मराठा जातीच्या राजकारणी माणसांच्या हातातच महाराष्ट्र राज्यातील सत्ताशकट आहे. मराठा जातीचा कल या राज्यकर्त्या मराठ्यांमध्ये अत्यंत कडव्या भावनेने जागृत आहे, याचा अनुभव आजच्या महाराष्ट्रात मराठेतर जातीसमूहांना भोगावा लागतो आहे. शूद्रातिशूद्रांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील ही अडचण दूर करण्यासाठी पुन्हा प्रबोधनकारांसारख्या परखड विचारवंताची महाराष्ट्राला गरज आहे.
मराठे क्षत्रिय की शूद्र? हा वाद तंजावर कोर्टात चालू होता. शाहू महाराजांचा या खटल्यात महत्त्वाचा सहभाग होता. त्यांना याकरिता सच्चा इतिहास संशोधकाच्या सल्ल्याची आणि त्यांच्याकडून इतिहासविषयक खर्या पुराव्याची आवश्यकता होती. महाराजांच्या पदरी भास्करराव जाधव, प्रो. डोंगरे, अण्णासाहेब लठ्ठे यांसारखे मोठे ब्राह्मणेतर बुद्धिमंत आणि इतिहास संशोधक असतानाही प्रबोधनकारांना भेटीसाठी बोलावून घेतले. या खटल्याच्या अनुषंगाने उपलब्ध असलेल्या कागदपत्रांची सत्यासत्याची पडताळणी करून पाहिली. ते १९०७-०८ साल असावे. उपरोक्त निमित्ताने प्रबोधनकारांचा आणि शाहू महाराजांचा स्नेहबंध जोडला गेला तो महाराजांच्या अखेरपर्यंत टिकला.
कोल्हापूरच्या त्या वारीतच स्नेहसोबत्यांच्या भेटी प्रबोधनकारांनी घेतल्या आणि ब्राह्मणेतर चळवळीशी शाहू महाराजांशी त्यांचा अतूट ऋणानुबंध जोडला गेला. महाराज मुंबई, पुणे, कोल्हापूर इत्यादी मुक्कामी आलेत. जेव्हा जेव्हा त्यांना प्रबोधनकारांच्या सल्ल्याची गरज वाटे तेव्हा तेव्हा ते प्रबोधनकारांना अगदी त्यांच्या कामाच्या ठिकाणी गाठावे लागले तरी गाठत. अथवा घरी जाणे शक्य असेल तर जात. अथवा आपल्या विश्वासू नोकराकरवी प्रबोधनकारांकडे आपला बोलवा पाठवत. सन १९२१ सालची अत्यंत विहंगम हकिकत प्रबोधनकारांनी आपल्या जीवनगाथेत नमूद केली आहे. श्रमातिरेकाने टायफॉईड, न्यूमोनियाच्या आजाराने प्रबोधनकार जवळजवळ तीनचार महिने आजारी होते आणि त्यांनी आपल्या सहकार्यांकरवी पाचेक हजारांचा चेक प्रबोधनकारांसाठी पाठवून दिला. तो प्रबोधनकारांनी कसा नाकारला...खरे तर यानिमित्ताने शाहू महाराजांनी एकार्थी प्रबोधनकारांचे सत्त्वच पाहण्याचा प्रयत्न केला आणि खास ते महाराजांच्या कसोटीलाही उतरले. ही सर्व स्टोरी प्रबोधनकारांच्या शब्दातच वाचायला हवी.
जाणकारांना इतकी मनस्वी आणि प्रबोधनकारांचा दुर्दम्य स्वाभिमान दाखवणारी अशी आहे. एखाद्याला कसाला लावायचा कसा याचे मंत्रतंत्र महाराज पुरेपूर जाणत असत. ज्या तिघा सहकार्यांच्या हाती प्रबोधनकारांसाठी आर्थिक मदत महाराजांनी पाठविली होती त्यांनासुद्धा त्याचा सुगावा लागू नये. एखाद्याकडून कोर्या कागदावर मजकूर लिहून घ्यायचा, दुसर्याकडून नाव, तिसर्याकडून पत्ता, नंतर स्वत: सही करून पाकीट सीलबंद करायचे. नंतर हाताखालच्या कुणाला तरी पुण्याला पाठवून पुढे हे पत्र ठाकरेंना समक्ष जाऊन भेटा आणि द्या, असा आदेश द्यायचा. ते तिघेजण प्रबोधनकारांच्या घरी गेले आणि पाकीट हातात देताना त्यांना कळले की आपणाला चेक देण्यासाठी पाठविले आहे.
प्रबोधनकारांनी तो चेक चार खडे शब्द सुनावून परत पाठविला. पुढे आजारातून उठून प्रबोधनकार स्वत:च्या ऑफिसात कामावर असताना त्यांना महाराजांचा फोन आला. ते मुंबईला आले आहेत. त्यांनी पन्हाळा लॉजवर भेटण्यासाठी प्रबोधनकारांना बोलावले आहे वगैरे. यावेळची हकीकत प्रबोधनकारांच्या शब्दात दिल्याशिवाय राहावत नाही.
‘‘पैशाच्या जोरावर अनेक माणसांची मी गाढवे बनविली आहेत.’’ असे नेहमी महाराज म्हणायचे ते माझ्या लक्षात होते. एखाद्याचे सत्त्व पाहायचे म्हणजे तो पैशांच्या कडकडीत अडचणीत असेल अशा नेमक्या वेळी. माझ्या आजाराची बातमी महाराजांपर्यंत साहजिकच गेलेली होती. एके सकाळी अचानक कै. श्रीपतराव शिंदे (‘विजयी मराठा’चे संपादक हे माझे निकटचे स्नेहीच होते). मथुरे आणि दरबारचे एक ऍडव्होकेट (त्यांचे नाव विसरलो. तंजावर केसच्या खटपटीत दरबारातर्फे ते काम पाहात असत) ही मंडळी मिरांडा चाळीत माझ्या बिर्हाडी आली. मी बिछान्यावर पडलेलो होतो. ती मंडळी भोवती कोंडाळे करून बसली. इकडे तिकडे बातचीत झाल्यावर, पुराणांच्या आधाराने अमुक विषयावर ३०-३२ पानांचे एक चोपडे लिहून द्यावे, अशा आशयाचे महाराजांच्या स्वदस्तुरचे पत्र त्यांनी मला दिले.
मी: माझी अवस्था पाहतच आहात. लेखन शक्य नसले तरी ते सांगतात त्या विषयावर मी काहीही लिहिण्याचा स्पष्ट नकार देतो. पुराणे म्हणजे शिमगा मानणारा मी आहे.
ऍडव्होकेट: आताच पाहिजे असे नाही. बरे झाल्यावर निवांतीने लिहिले तरी चालेल.
मी: बरा झाल्यावरही लिहिणार नाही. छत्रपतींसारखा नृपती असे भलभलते विषय काय सुचवतो? एखाद्या जमातीला नीचातली नीच ठरविली म्हणजे आपली जमात श्रेष्ठ ठरत नाही.
त्यावर त्यांनी खिशातून चेक काढला. ‘‘महाराजांनी हा दिलाय, घ्या.’’
मी: कशाला? कशासाठी? सांगता ते लिहिणे करण्यासाठी? जा परत घेऊन तो.
श्रीपतराव: हे पहा, केशवराव. छत्रपतींचा प्रसाद आहे हा. नकार देणे बरे नव्हे.
मी: असला प्रसाद छत्रपतींनीच काय, प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने दिला तरी थुंकतो मी त्यावर. जा घेऊन. (चेक पाच हजारांचा होता) असल्या रकमा महाराज अशा कामीच उधळत असले, तर त्यांच्याविषयी माझा आदरही ओहोटीला लागला असे सांगा जाऊन त्यांना. (मंडळी परत गेली.)
शाहू महाराज आणि प्रबोधनकार यांचे नाते हे असे होते. वेळप्रसंगी एकदम मधुर तर वेळ आलीच तर टोकाचे कडवट. मात्र त्यात एक निर्मळता, पारदर्शकता आणि तत्त्वनिष्ठता होती. त्यामुळे ते कधीच तुटले नाही, घट्टच राहिले.