प्रबोधनकारांचा सातारा
महावीर मुळ्ये
सातारा आणि प्रबोधनकार यांचं नातं अनोखंच. कर्मवीर भाऊरावांनी सांगितल्याप्रमाणे सातारा ही प्रबोधनकारांची खरी कर्मभूमी आहे. त्याच्या आधुनिक इतिहासावर प्रबोधनकारांची छाप आहे, हे आजच्या पिढीला कुठे ठावूक असेल? सांगताहेत प्रबोधनकारांचे ज्येष्ठ अभ्यासक महावीर मुळ्ये.
…
महाराष्ट्राच्या दक्षिण पठाराच्या पश्चिम भागात वसलेला (जुना) सातारा जिल्हा. याचा बराचसा मुलूख डोंगराळ व द-याखो-यांनी व्यापलेला आहे. सातारा शब्दाची व्युत्पत्ती- मूळ सातारे नावापासून सातारा हा शब्द बनला आहे. किंवा सतरावरून सातारा शब्द आला असावा. सातारच्या किल्ल्याच्या पायथ्यापासून सात ओढे वाहतात. ते भल्या मोठ्या द-यातून वाहतात. या सातद-यावरूनच सातारा हे नाव पडलं असावं. सातदरे-सातारे-सातारा ही व्युत्पत्ती योग्य वाटते. पिढ्यानंपिढ्यांच्या कर्तबगारीने इतिहास रंगत असतो. प्राचीन इतिहासाच्या खाणाखुणा आजही या जागृत साता-यानं अभिमानानं आपल्या छातीच्या दगडावरील चिन्हे आणि खुणांनी जपलेल्या आहेत. आगाशिवाच्या डोंगरातील बौद्धलेणी इसवी सनापूर्वी अडीचशे वर्षापासूनची असून ‘गोपालपुरास संघमित्रास लेणं दैयधर्म’ म्हणजे गोपाळाचा पुत्र संघमित्र याचा दानधर्म असे एक लेणे आहे. मगध विद्यापीठाची शाखा आगाशिवाच्या लेण्यात होती.
इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून तेराव्या शतकाच्या अखेर साता-यात चालुक्य. राष्ट्रकूट, सिंघण, शिलाहार, यादव यांचा अंमल होता. चौदाव्या शतकात देवगिरीचं राज्य संपलं आणि बहामनी राज्याची अस्मानी सुलतानी सुरू झाली. सन १५०० साली आदिल शहानं जावळी प्रांत मोरे घराण्याकडे दिला. मोरे यांनी मर्दुमकी गाजवून परिंद्यांच्या लढाईत बुर्हण निजामाचा पराभव केला. १६३७ साली शहाजी राजे भोसले आदिलशाहकडे चाकर होते. त्यामुळे अहमद आदिल शहानं शहाजीस क-हाड प्रांत बावीस गावाची जहागिरी दिली.
सन १९३९ साली शहाजीच्या मदतीनं मुधोजी आणि बजाजी निंबाळकर साता-याच्या किल्ल्यातून सुटून फिरून फलटनचे जहागीरदार झाले. पुढीलसाठी १६४० बजाजीची बहिण सईबाई हिचं शाहपुत्र ‘शिवाजी’ शी लग्न झालं.
शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेनंतर महाबळेश्वर ते क-हाड पर्यंतचा कृष्ण नदीचा परिसर स्वराज्यात सामील झाला. सह्याद्रीच्या कडेकपारीत राहणा-या या जिल्ह्यातील व्यक्तींची खास अशी वैशिष्ट्यं आहेत. मराठमोळी स्वाभिमानी लढाऊ वृत्ती, विशिष्ट शेती व्यवस्था, व भौगोलिक परिस्थिती यामुळे येथील शेतकरी थेट शिवकालापासून ते आजतागायत मानी व स्वातंत्र्यप्रिय आहेत. बेडर आणि त्यागी वृत्ती त्यांच्या नसानसातून खेळलेली आहे. तो कसलाही अन्याय सहन करणारा नाही.
सातारा म्हणजे लढाऊ मराठी बाणा व तेजस्वी छात्र परंपरा गनिमी काव्यानं लढणा-या शूर वीरांचं जणू केंद्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याला बळकटी आणणारे निष्ठावान मावळे साता-याच्या डोंगराळ व जंगलाच्छादित भागात रहात होते. शौर्य व स्वतंत्रवृत्ती हे सर्वसामान्यांचं ब्रीद होतं. दडपशाहीचा प्रतिकार करण्यास तो खवळून उठतो. म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय आंदोलनात त्यानं सातत्यानं धडाडीनं भाग घेतला आहे.
आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीची पाळंमुळं सातारा जिल्ह्यात रूजली. याच जिल्ह्यानं सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया सातत्यानं एकाच पिढीकडून दुस-या पिढीकडे संक्रमित केली आहेत. सामाजिक क्रांतीत अग्रेसर असणारा आणि भारताच्या भावी स्वातंत्र्याच्या लढ्याची पायाभरणी याच जिल्ह्यानं केली. अशा जागृत सातारा जिल्ह्यात प्रबोधनकारांचं वास्तव्य होतं. महाराष्ट्रभूषण प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे म्हणजे एक बहुरंगी नि बहुरूपी कर्तृत्ववान पुरूष, त्यांनी उभ्या आयुष्यात निर्भिड पत्रकार, साहित्यिक, नाटककार, छायाचित्रकार, शिक्षक, टंकलेखक, ओजस्वी वक्ते, झुंजार नेते, वादविवादपटू, संपादक, पटकथा, संवादलेखक, चरित्रकार, सत्यशिल इतिहास संशोधक, उद्यमशिल व्यावसायिक, ज्वलंत समाज सुधारक, कनवाळू दलितोद्धारक, आधुनिक सत्यशोधक, प्रतिभावंत कलाकार, अशा विविध भूमिका केल्या. १९२० नंतरच्या पाच दशकात सा-या महाराष्ट्रात त्यांचा मोठा दरारा होता.
प्रबोधनकार मुंबई इथं नोकरीत असताना दादर इथं स्वाध्याय आश्रम नावाच्या संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवित होते. आपल्या सामाजिक कार्याच्या विस्तारासाठी स्वत:च्या मालकीचं एक मासिक आपल्या विचाराच्या प्रचारासाठी १६ ऑक्टोबर १९२१ रोजी सुरू केलं, त्याचं नाव होतं, ‘प्रबोधन’. अल्पावधीत प्रबोधन मासिक महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहोचलं होतं. याच स्वाध्याय आश्रमात सातारचे कर्मवीर भाऊराव पाटील येत होते. त्या दोघांची सच्ची मैत्री झाली. दोघंही जन्मजात समाजसुधारक. त्या काळात प्रबोधनकार ठाकरे म्हणजे वक्तृत्वाची मुलूखमैदान तोफ होती. त्यांच्या लेखणीनं आणि वक्तृत्वानं सारा महाराष्ट्र त्यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखू लागला.
अशा थोर समाजक्रांतीकारक प्रबोधनकारांना कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिवजयंतीनिमित्त व्याख्यानासाठी १९२२ मधील एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आमंत्रण दिलं होतं. प्रबोधनकार मुंबईहून साता-यास येत असता त्यांची पुणे स्टेशनवर कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांशी भेट झाली. विचारपूस झाल्यानंतर प्रबोधनकार सातारला कर्मवीरांच्या निमंत्रणावरून शिवजयंतीच्या व्याख्यानासाठी जात असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावर छत्रपती शाहू महाराज म्हणाले, ‘साता-याला जातोस तर प्रतापसिंह छत्रपतींची कहाणी मुंबईत मला जशी सांगितलीस तशीच सांग सगळ्या मावळ्यांना नि घाल त्यांच्या डोक्यात नव्या विचाराचे वारे’. महाराजांचा निरोप घेऊन प्रबोधनकार ठाकरे सातारारोडला उतरले. कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांच्या मित्रांनी प्रबोधनकार ठाक-यां स्वागत करून सातारा येथील कै. नारायणराव वाळवेकर सराफाकडे आले आणि साता-यातील कार्यक्रमाचं नियोजन झालं.
प्रतापसिंह नि रंगोबापूजी यांच्या संमिश्र चरित्राचं तीन हफ्त्याचं नि तीन दिवसाचं प्रबोधनकारांचं व्याख्यान साता-यात चांगलंच दणाणलं. ज्या जुन्या राजवाड्यात तो चित्तप्रक्षोभक मुकाबला घडला त्या वाड्याच्या पाय-यांवरच उभं राहून ती कथा सांगण्यात आल्यामुळे त्या व्याख्यानमालेला भलताच रंग चढला. कित्येक महिने सबंध सातारा जिल्हा प्रतापसिंह आणि रंगोबापूजी यांच्या कहाणीच्या तपशिलांनी घोंगावत होता. ज्याच्या –त्याच्या तोंडी एकच विषय. तिथल्या दोघा शाहिरांनी दोन पोवाडे तात्काळ रचून त्याचे जलसे जिल्हाभर गाजविले. कै. श्रीपतराव शिंद्यांच्या ‘विजयी मराठा’ या पत्राच्या खास बातमीदारानं त्या व्याख्यानांचा रिपोर्ट पाठोपाठ तीन अंकात छापल्यामुळे हा इतिहास तमाम महाराष्ट्रात सर्वश्रुत झाला...टिळक साप्ताहिकाचे प्रमुख अच्युतराव कोल्हटकर यांना हा विषय इतका भावला की त्यांनी त्यावेळी दि. १७ नि २५ जून १९२२ च्या अंकात सर्व व्याख्यान छापून त्यावर एक संपादकिय स्फूटही लिहिलं.
छत्रपती प्रतापसिंह आणि रंगोबापूजींच्या उपेक्षित कार्यावर दिलेल्या व्याख्यानाचंच प्रबोधनकारांनी एक छोटंसं पुस्तक लिहिलं. त्याचं नाव होतं ‘साता-याचे दैव का दैवाचा सातारा!’ या छोट्याशा ग्रंथाच्या शिर्षकामध्ये दैव आणि दैवाचा या दोन शब्दांची विशिष्ट पद्धतीनं रचना करून मानवाविषयी हिंदू धर्मातील धर्म व संस्कृतीत कोणकोणत्या स्वरूपात दैववादाला स्थान आहे, याविषयी त्यांच्या मनात विशिष्ट विचार आलेले दिसतात.
देवताची व्यक्तिनिरपेक्ष व बलिष्ट अशी शक्ती म्हणजे दैव होय. दैवच माणसाला प्रगती अथवा अधोगतीकडे नेतं. एखाद्या शहाराचं वा राष्ट्राचंही भविष्य दैवानं निश्चित केलेलं असतं. जे व्हावं म्हणून दैवानं ठरविलेलं असेल ते होणारच. जे होऊ नये म्हणून ठरविलेलं असेल ते कधीही होणार नाही. खेळ, युद्ध अथवा इतर क्षेत्रातील यशापयश दैवाधीन असतं, अशा समजूती असतात. एखादी विलक्षण घटना अनपेक्षितपणे घडते तेव्हा तर दैववादी माणसाचा दैवावरचा विश्वास अधिकच दृढ होतो. विशेषत: व्यक्तीचा जन्म, विवाह, मृत्यू इ. बाबतीत घडणा-या घटना दैवामुळेच घडतात असं मानलं जातं.
साता-याचे दैव का दैवाचा सातारा: या ग्रंथाच्या प्रस्तावनेत साता-याविषयी प्रबोधनकार म्हणतात. सातारा- एकच शब्द आणि तीनच अक्षरे पण त्यात किती सुखदु:खाच्या गोष्टी आशा-निराशेचा इतिहास आणि अंगावर रोमांच उभे करणा-या स्फूर्तीची व हृदयविदारक कल्पनांची साठवण झालेली आहे. हिंदवी स्वराज्याच्या पुनर्घटनेचा धडाडीचा भगिरथ प्रयत्न येथेच झाला आणि त्या स्वराज्याच्या बलिदानाचा भिक्षुकी यज्ञ येथेच धडाडला. छत्रपतींच्या सार्वभौम सत्ता प्रसाराची दिव्यशक्ती येथेच प्रथम फुरफुरली व अटकेपार गुरगुरली आणि छत्रपती मालकाची स्वारी पेशवे नोकरांच्या कैदखान्यात येथेच झुरणीला लागून बेजार झाली.
सातारचे प्रतापसिंह महाराज हे खरेखुरे जनकल्याण दक्ष राजे होते. लोकहिताची त्यांनी अनेक कामं केली. परंतु कावेबाज ब्रिटीशांनी कपट कारस्थान करून एका रात्रीत छत्रपती प्रतापसिंहांना पळवून नेलं व लिंब येथील गोठ्यात ठेवलं. नंतर त्यांना काशी येथे हद्दपार केलं.
ब्रिटीशांच्या जुलुमाविरूद्ध सनदशीर मार्गानं लढणारा मराठ्याच्या इतिहासातील शेवटचा मुत्सद्दी रंगोबापूजी गुप्ते होय. प्रतापसिंहांना न्याय मिळावा म्हणून तो विलायतेत गेला. तेरा वर्ष तेथे राहिला. इंग्रजी भाषा आत्मसात करून तेथे २५ सभा
घेतल्या व पार्लमेंटमध्ये आवाज उठविला, पण व्यर्थ, म्हणून तो हिंदुस्तानात परत आला व भूमिगत राहिला. त्यानं सातारा हे मुख्य ठाणे करून भोरपासून खानापूर (बेळगाव) पर्यंत उठावाची तयारी सुरू केली. सातारच्या छत्रपतींच्या गादीची पुन्हा स्थापना करण्याकरिता त्याने शस्त्रे गोळा केली. पोलीस व सैन्य सामील करून घेतले. गावोगावच्या मांग, रामोशी, मराठा, ब्राम्हण, सोनार, कुणबी समाजातील सुमारे ऐंशी कार्यकर्ते जमविले परंतु हा कट उघडकीस आला म्हणून त्यापैकी काहीजण शेवटपर्यंत भूमिगत राहिले. राजद्रोहाच्या आरोपाखाली ८ सप्टेंबर १८५७ रोजी ब्रिटीशांनी पाचांना फाशी दिली, सहांना तोफेच्या तोंडी दिलं व सहांना गोळ्या घालून ठार केलं. शिवाय या सर्वांची खाजगी मालमत्ता जप्त करून लोकांवर दहशत बसविण्याचा प्रयत्न केला.
प्रतापसिंह महाराज शांतता प्रिय राजे होते. ते उत्तम लोकाभिमुख प्रशासक, स्वराज्याविषयी स्वाभिमानाचा बाणा असणारे महाराज यांनी आपल्या राज्यात खूप सुधारणा केल्या होत्या. छत्रपती प्रतापसिंह महाराजांचं चौदा पेढ्यांचं संस्थान होतं. निरा व वारणा या नद्या मधील भिमा व कृष्णा यांच्या संगमापावेतो त्यांचा मुलुख होता. महाराजांच्या अंमलाखाली जहागिरदार होते. पंतप्रतिनिधी औंधकर, पंतसचिव भोरकर, अक्कलकोटकर- राजे भोसले, फलटणकर – निंबाळकर, जतकर-डफळे, परसणाचे- नवाब शेखमिरे हे होते.
प्रतापसिंहांनी इंग्रजांशी मैत्रीचे संबंध ठेऊन राज्यकारभार हाती घेतला आणि तो उत्तम रितीने चालवला. प्रथमत: त्यांनी यवतेश्वर आणि महादरा या ठिकाणी तळं बांधून तिथून नळानं पाणी शहरात आणलं. जलमंदिर नावाचा प्रसिद्ध महाल बांधला. प्रशासनासाठी नवीन राजवाडा, त्यासमोर पेठ वसवली. इंग्रज व संस्कृत शाळा सुरू केल्या. ग्रंथरचना नि प्रकाशनासाठी छापखाना सुरू केला. कोतवाल चावडी बांधली, अठरा कारखान्याच्या इमारती बांधल्या, विविध मंदिरांची निर्मिती केली. लोकोपयोगी अनेक हौद बांधले. प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वराचा शोध लावला, त्याचा विकास केला, शहरातील रस्ते व राज्यात येणारे रस्ते तयार केले. लष्करी शिक्षण सुरू केलं. स्त्री शिक्षणाचे ते आद्यकर्ते होते. त्यांनी आपल्या कन्येसाठी शाळा सुरू केली.
प्रतापसिंह महाराजांच्या शिक्षणविषयक कार्याची दखल इंग्लडमधील रॉयल एशियाटिक सोसायटीनं घेऊन त्यांना सन्मानानं सभासद करून घेतलं होतं. ‘खिलवान’ नावाच्या एका महालातून ते राज्यकारभार चालवित. ते सिंहासनाऐवजी टेबलखुर्ची या आधुनिक माध्यमांचा वापर करीत. असं करणारा हा पहिला भारतीय राजा होय.
संपूर्ण सातारच्या परिघ परिसरात विविध ऐतिहासिक व धार्मिक स्थळं आहेत. समृद्ध इतिहास जपणा-या या जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षणसंस्था ‘रयत शिक्षण संस्था’ आहे. तिचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आणि प्रबोधनकार ठाकरे यांची सच्ची मैत्री होती. संस्था स्थापनेत आणि तिच्या प्रसिद्धीसाठी प्रबोधनकारांनी खूप प्रयत्न केले आहेत. या दोन्ही कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
महाराष्ट्राचा कृतिशील इतिहास घडविणा-यांमध्ये या दोघांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. प्रबोधनकार आणि कर्मवीर यांचं सामाजिक कार्य विस्मृतीच्या पडद्याआड जाऊ नये तसेच महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात याची नोंद होणं आवश्यक आहे. प्रबोधनकारांचा आणि कर्मवीरांचा जन्म सप्टेंबरचा. प्रबोधनकारांची जन्मतारीख १७ सप्टेंबर १८८५ आणि कर्मवीरांची जन्मतारीख २२ सप्टेंबर १८८७. त्यांच्या १२५ व्या व १२३ व्या जन्मवर्षपूर्तीनिमित्त हा लेख.