विजयादशमीचा संदेश
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
तिसऱ्या आवृत्तीविषयी
विजयादशमीचा संदेश
खास कायस्थ प्रभू समाजासाठी
विजया दशमीनिमित्त पोवाडा
लेखक, प्रकाशक, मुद्रक
केशव सीताराम ठाकरे
प्रबोधन ऑफिस,
३४५, सदाशिव पेठ, पुणे शहर
किंमत बिनमोल
३री आवृत्ती
२७ सप्टेंबर १९२५
पोवाडा
विजयादशमीचा संदेश
(चाल. सबसे रामभजन करले.)
तूं तोड बन्धने सारी, सांगे सगळ्यांना दसरा ॥ धृ. ॥
सुखदुःखांच्या सर्व भावना गुलामगिरिचे पाश ।
कोण तुझ्याविण तयार करतो? तुझा तूंच परमेश ॥ १ ॥
सांगे सगळ्याना दसरा ॥
बुद्धीचा चवचालपणा तव आखुनि घेतो सीमा ।
धर्माचें थोताण्ड त्यामधें तडफढ करिशि रिकामा ॥ २ ॥
सांग कधिं कुठें मानव केला धर्मानें पैदा ।
देव धर्म हे मानवनिर्मित, मग कां उलट सौदा ॥ ३ ॥
मनुष्य उघडाउघडा बाप तो धर्माचा देवाचा ।
मानियला तर देव नाहितर धोण्डा कुचकामाचा ॥ ४ ॥
‘धर्म असा अन् देव तसा’ ही चोरांची नीती ।
सीमा सगळ्या स्वयंनिर्मिता, कसली त्यांची भीती ॥ ५ ॥
चौंढाळांची स्वार्थी बडबड अखेर बनले वेद ।
कितीक चरले त्यावर मुबलक जार चोर निर्वेध ॥ ६ ॥
देवासाठी जीव टाकिती उलटे सुटले हिन्दू ।
माणुसकीची दाद न कोणा, द्वैताचे विषसिन्धू ॥ ७ ॥
शोधित बसले देव अजागळ देश हातचा गेला ।
गुलाम मुर्खो धर्म कोणता? वाहि पखाली हेला ॥ ८ ॥
‘धर्मा येते ग्लानी तेव्हां देव घेइ अवतारा’ ।
नामर्दाचा हाच तंबुरा छेडित बसले तारा ॥ ९ ॥
‘धारण करि तो धर्म’ म्हणतसां तोण्डानें एका ।
ग्लानि येई तो धर्म कशाचा? कर्म तुझें तें लेका ॥ १० ॥
उपनिषदांना देव न कळला, तुलाच कैसा फळला ।
पुराण-मदिरा ढोसुनि ढोसुनि विवेकगड ढासळला ॥ ११ ॥
खुद्द स्वदेशीं गुलाम बनले भक्त तीस कोटी ।
पाहवते ज्या देव कशाचा? ती सैतानी कोटी ॥ १२ ॥
सैतानाचा धर्म पाळतां, मोक्ष त्यास सैतानी ।
धर्म श्रेष्ट तर भरतखण्ड कां सडलें कटु द्वैतांनी ॥ १३ ॥
देव धर्म हे भटी सांपळे घातक झाले देशा ।
मोडा तोडा उलथुनि पाडा उखडा त्यांच्या पाशा ॥ १४ ॥
धर्मावाचुनि प्राण न जाई देवाविण नच अडते ।
आत्मशक्ति खंबीर तयाच्या त्रिभुवन पायां पडते ॥ १५ ॥
संस्कृति रूढी जातिभेद या धर्माच्या अवलादी ।
माणुसघाण्या हिन्दू केला, बाप लेक प्रतिवादी ॥ १६ ॥
गर्व सर्व हिन्दूना मोठा, जननाची पुण्याई ।
ब्रह्मदेवही उभाच चिरला! काय धर्म-नवलाई ॥ १७ ॥
रवि-चंद्राचे वंशज कोणी, कुणि शेषाचे लेक ।
ब्रह्ममुखांतुनि भटजी कोणा कूर्मी अलगज टेक ॥ १८ ॥
उच्चनीचता हडळ माजवी भरतखण्डि जो धर्म ।
‘शिवू नको हो दूर’ म्हणे तो, फुटलें त्याचें कर्म ॥ १९ ॥
पावित्र्याचा श्रेष्ठपणाचा भटांस मोठा तोरा ।
भटेतरांना नीच गणाया, काय हक्क या चोरां ॥ २० ॥
विचारक्रांन्ति अखंड घडवी काळ बडा गारोडी ।
नित्य नवें तें हवें क्रान्तिला, जुन्यास लाभे तिरडी ॥ २१ ॥
एकोणिस शतकांचि थेरडी मनुस्मृति कवटाळी ।
माणुसकीला लावी टाळी, भटजी तिज कंवटाळी ॥ २२ ॥
नव्या मनूच्या नव्या स्मृतीचे नव्या हिमतीचे घोडे ।
बघ फुरफुरती झाडिति टापा, जुन्यास खेटर जोडे ॥ २३ ॥
सिंन्धूपासुनि हिन्दु निघाला हिन्दु सिन्धु हा मोठा ।
भिक्षुकशाही विष-बिन्दूनें सिंन्धु ठरविला खोटा ॥ २४ ॥
समाज हिन्दू अमृतसिन्धू बनला घाण उकिरडा ।
जाति रूंढिच्या बाष्कळ गप्पा, हाणा त्याना जोडा ॥ २५ ॥
सीमा जोंवरि तोंवरि समता? बोल फोल तो समजा ।
सीमा तुडवा, चालतील ना मग काळाच्या गमजा ॥ २६ ॥
सिन्धुसारखा हिन्दु सगळा एकजीव जर झाला ।
याच उकिरड्यावरती समजा स्वर्ग धावुनी आला ॥ २७ ॥
‘समतावाला गोकुळकाला’ बरळे भटि भाला ।
गोकुळकाला जगां दाखवी भगवद्गीतावाला ॥ २८ ॥
सीमा तोडा, प्रेमा जोडा, गुलामगिरीला तुडवा ।
माणुसकीचा धर्म साधण्या जातिभेद खल बुडवा ॥ २९ ॥
मानित सीमा ते नर कसले? जिवंत प्रेतें सारी ।
या प्रेतांना स्वराज्य कसले? काळचक्र त्या मारी ॥ ३० ॥
सिन्धुसारखा समर्थ व्हावा हिन्दू चौखण्डीं ।
रमाकान्त शाहीर डफावर हाणि थाप लोखण्डी ॥ ३१ ॥
***