वैदिक विवाह विधि
संपादन – प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
पहिल्या आवृत्तीविषय़ी
गजानन भास्कर वैद्य संशोधित
वैदिक विवाह-विधि
।। ओम नमो भगवते वासुदेवाय ।।
संपादक, मुद्रक व प्रकाशक
केशव सीताराम ठाकरे
पुस्तकें मागविण्याचा पत्ता
प्रबोधन प्रिंटिंग प्रेस
२७, बुधवार, पुणें शहर.
किं. ८ आणे
प्रकाशन ६ सप्टेंबर १९२६
अर्पणपत्रिका
आद्य हिन्दु मिशनरी
व
वैदिक विवाहबद्धतीचे संशोधक
प. वा. गजानन भास्कर वैद्य
यांच्या दिव्यात्मास
ही त्यांचीच कृति
गंगेच्या जलानेच गंगेची पूजा या न्यायाने
आदरपूर्वक अर्पण केली आहे
- केशव सीताराम ठाकरे
पुस्तकाविषयी
गजानन भास्कर वैद्य यांच्या हिंदू मिशनरी सोसायटी या संस्थेत प्रबोधनकार स्थापनेपासूनच आघाडीचे कार्यकर्ते म्हणून सक्रिय होते. हिंदू धर्मातून इतर धर्मात गेलेल्यांना स्वेच्छेने पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचा एक सोपा विधी त्यांनी शोधून काढला होता. तसेच लग्नाच्या विधींमध्ये जाती आणि प्रदेशानुसार होणारा बदल टाळून एकच वैदिक मंत्रांच्या आधारे होणारा विवाह विधीही वैद्य यांनी संपादित केला होता.
एकीकडे छत्रपती शाहू महाराजांसारख्या राजालाही ब्राह्मण पुरोहित वैदिक मंत्रांनी कर्मकांडं नाकारत असताना एका ब्राह्मणेतराने ती मक्तेदारी मोडून काढत सर्वांसाठी एक विधी आखून देणं हे अनेक अर्थांनी क्रांतिकारक होतं. त्यामुळे प्रबोधनकार या चळवळीत त्यांच्या सोबत होते. त्यांनी इंदूर, नागपूरपर्यंत महाराष्ट्रभर दौरे काढून या विवाहविधीचा प्रसार केला. तसेच स्वतः आचार्य म्हणजे पुरोहित बनून लग्नं लावलीही.
या वैदिक विवाह विधीच्या चुकीच्या आवृत्त्या बाजारात आल्यामुळे वैद्य यांनी संपादित केलेला मूळ विधी छापून यावा, यासाठी प्रबोधनकारांचा आग्रह होता. मात्र `प्रबोधन`च्या धावपळीमुळे त्यांना ते जमलं नव्हतं. त्यांनी वैद्य यांच्या मृत्यूनंतर ६ वर्षांनी या विधीची अधिकृत पुस्तिका छापली. पुस्तिकेचे संपादक, प्रकाशक आणि मुद्रक म्हणून प्रबोधनकारांचं नाव आहे. वेदांमधले संस्कृत मंत्र आणि लग्नासाठीच्या विविध विधींचे तपशील या पुस्तिकेत आहेत. तसेच त्यात `प्रबोधन`मध्ये या विषयावर आधी प्रकाशित झालेले दोन लेखही आहेत.
पुढील पुस्तकात वैद्य यांनी संपादित केलेले मंत्र आणि त्याला जोडून असणाऱ्या विधींची कृती दिलेली नाही. फक्त प्रबोधनकारांनी लिहिलेले लेख आहेत, याची जिज्ञासू वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
सचिन परब,
प्रबोधनकार डॉट कॉमचा संपादक
विवाह विधीचें संशोधन
हिन्दुजनांतलि असंख्य जातींत विवाहविधीच्या पद्धति भिन्न भिन्न आहेत. सर्वांत जर कांहीं विधिसाम्य दिसतच असले तर तें `शुभमंगल साऽवधान`मध्ये दिसतें; बाकी कशास काहीं मेळ नाहीं. खुद्द ब्राह्मण म्हणविणारांतसुद्धां पद्धतीची एकवाक्यता नाहीं. यजुर्वेद्यांच्या चित्पावनांशीं जुळत नाहींत, चित्पावनांच्या देशस्थांशी पटत नाहींत व दैवज्ञांच्या विश्वब्राह्मणांहून भिन्न. हाच प्रकार इतर सर्व जातींतून पहावयास मिळतो. पेशव्यांच्या दप्तरांत कोणकोणत्या जातीच्या नवरदेवाची वरात कशाकशावर बसवून काढावी, याचे निर्णय झालेले कागदपत्र पाहिले तर, कोणाची वरात घोड्यावर, कोणाची खेचरावर, कोणाची बैलावर, कोणाची पालखीत, कोणाची माणसाच्या डोक्यावर, तर कोणाची पायीं, असे अनेक प्रकार त्यांत दिसतात. (बिचाऱ्या गाढवाची मात्र सोय कोठेंच लागली नाहीं!)
सारांश, मुसलमान, पारशी, यहुदी, क्रिस्ती म्हटला म्हणजे त्याच्या विवाहविधीची एक ठराविक पद्धत असते; तसा प्रकार हिन्दुजनांत नाहीं. सर्वसाधारण साम्य जर हुडकूनच काढलें तर बहुतांशी `शुभमंगल साऽऽवधान` या मामुली बेंडबाजा पद्धतीत दिसतें. कित्येक जातींतील लग्नविधि तर इतक्या चमत्कारिक पद्धतीने होतात कीं ते पाहून शिसारी आली नाहीं, तरी हसूं आल्याशिवाय राहत नाहीं. शिवाय भिक्षुक भटजींच्या अकलेचे व विद्वत्तेचे तारे तुटतात, त्याचा महिमा सहस्रमुखी शेषाच्या बापाला सुद्धां वर्णन करितां यावयाचा नाहीं.
एका उच्चवर्णीय तरुणाच्या लग्नसमय भटजीनें `शांताकारं भुजगशयनं` श्लोक सात वेळां म्हणून सप्तपदीचा विधि उरकलेला आम्ही स्वतः पाहिला. प्रत्यक्ष विधीच्या वेळीं काहीं बोलणें अप्रशस्त, म्हणून त्या वेदशास्त्रखंकाची खासगी गांठ घेऊन कानउघाडणी केली. तो म्हणाला `चाललं आहे झालं. यजमानाला विधीचें ज्ञान नसतं म्हणून आमच्यासारख्याचं भागतं. तुम्ही विधी समजून उमजून करण्याइतके हुशार बनलात, मग तुमचे सर्व विधि चालवणारे भटजीहि तसेच विद्वान मिळतील.` भटजीचें हें म्हणणें अगर्दी रास्त आहे.
विवाहविधि, त्याची आवश्यकता, त्याचें पावित्र्य व जबाबदारी या विषयींच्या ज्ञानाची हिन्दुजनांना तिळमात्र क्षिती वाटत नाहीशी झाल्यामुळे, भट सांगेल त्या चऱ्हाटाला वेदवाक्य मानून लग्नविधीचा खटाटोप कसा तरी चटावर आटपुन घेण्याकडे त्यांची प्रवृत्ति बेताल झाल्यास कांहीं आश्चर्य नाहीं. लग्नविधि आणि सामाजिक उन्नति यांचा परस्पर संबंध अत्यंत निकटचा आहे; इतकेंच नव्हे तर, या विधीच्या शुद्धतेकडे जनतेचें लक्ष जसजसे जाईल तसतसें आमच्या आंगीं खिळलेले व राष्ट्रोन्नतीला घातक होणारे अनेक सामाजिक दोष आपोआप नष्ट होतील.
हिन्दुजनांतल्या लग्नविधींत जे भिन्न भिन्न प्रकार दिसतात म्हणून वर म्हटलें आहे, त्यांचे नीट परीक्षण केलें तर असें स्पष्ट सिद्ध होतें कीं हे प्रकार धार्मिक नसून शुद्ध सामाजिक आहेत. त्यांतहि पुन्हा प्रांतविशिष्ट कल्पना, कौटुंबिक रूढी, परिस्थितीमुळें कधिकाळीं जडलेल्या किंवा मुद्दाम लादलेल्या रीतीभाती यांचेच प्राबल्य फार. अर्थात् या गोष्टींना धर्मशास्त्राची मान्यता मुळींच नसते. उदाहरणार्थ, पाठारे प्रभूजनांचे उपनयनविधि घराच्या मागल्या दरवाज्याकडे होतात. ह्याला कारण पेशवाईत त्यांच्यावर झालेल्या एका भयंकर ग्रामण्याचा परिणाम. यांत धर्म कसला? परंतु त्यांचा हा क्रम जणूं काय एकाद्या धर्माज्ञेप्रमाणें अझूनपर्यंत आहे तसाच चालूं आहे.
संशोधनाची वृत्ती जागृत होईपर्यंत मागीलदारचे उपनयनविधी पुढील दारापर्यंत कशाचे धूम ठोकणार? बहुतेक ब्राह्मणांतले विवाह माजघरांत उखळावर लागतात, साक्षीजन बाहेर मंडपांत गप्पा ठोकीत बसलेले असतात आणि तिकडे मंगलाष्टकांची नाटकी कवाईत होऊन भटजीनें `जयघंटा` म्हटलें कीं ताशांच्या खडखडाटंत साक्षीजन टाळ्यांचा कडकडाट करून `लग्न झालें` असें प्रदर्शित करतात. कायस्थ प्रभूत उपनयन विवाहादि विधि साक्षीजनांच्या समक्ष भर मंडपांत करावे लागतात; परंतु बंगाली कायस्थांत पडद्याची रानटी पद्धत अझूनहि असल्यामुळे त्यांच्या विवाह विधीत एक प्रकारचा रजपूत इस्लामी घाटणीचा सामाजिक `गोषा` घुसलेला असल्यास नवल नाहीं.
धार्मिक व सामाजिक स्वातंत्र्यार्थ असल्याने पुढे येत असलेल्या मराठे समाजाला असूनसुद्धा `पडद्या`पुढे बिनशर्त हार खावी लागत असते. सारांश, हिन्दुजनांच्या या अत्यंत महत्वाच्या अत्यंत उत्क्रांतिकारक व अत्यंत पवित्र अशा धर्ममान्य विधीच्या आचरणांत कालमानानुसार धार्मिक व सामाजिक गोष्टींचा भयंकर संकर झालेला आहे. गेली कित्येक शतकें लोकव्यवहाराच्या तंत्राने धर्माला धावपळ करण्याचा प्रसंग आल्यामुळे शेंकड़ों सामाजिक रूढी धर्माचाच मुखवटा घालून आज आमच्या बोकांडी बसल्या आहेत.
याचा परिणाम सहाजिकच असा झाला आहे की विवाहविधी धार्मिक व नैतिक तेज प्रस्फुरित करणाऱ्या आचारविधीला गचांडी मिळून त्याच्याठिकाणी सामाजिक भलभलत्या रुढींची खेकटी आज `धर्म धर्म` म्हणून आम्ही खुशाल डोक्यावर घेऊन नाचवीत आहोंत. सत्यशोधकांचा `वरचा पुरोहित` पाहिला तरी त्याला सुद्धा या रूढीपुढे हात टेकावे लागलेले आहेत. समाजपुरुषाच्या आगी झोंबलेल्या रुढीच्या खविसाचा नायनाट करणाऱ्या मांत्रिकाच्या शोधार्थ असतांना खुद्द खवीसच मांत्रिकाचे सोंग घेऊन दत्त म्हणून उभा राहिला की कसली सुधारणा आणि कसले काय? भीक नको पण कुत्रा आवर, असला अनवस्था प्रसंगच तो!
सुधारणा पाहिजे म्हणून सुधारणा करण्यास हात घालणे केव्हांहि श्रेयस्कर होत नाहीं. सुधारणेची सर्व आंगें, दोषांची उत्पत्ति स्थिति व व्याप, यांचा उत्कृष्ट अभ्यास प्रथम झाला पाहिजे. अभ्यासाला निरीक्षण कौशल्याची व निश्चित निर्णयशक्तीची जोड पाहिजे. इतक्या भांडवलावर सुद्धां गाडें निभणार नाही. सत्याचें प्रेम, असत्याची चीड आणि संशोधनार्थ अवश्य लागणारी मनाची न्याय निष्ठुरता यांच्याशिवाय सुधारणेचे पाऊल पुढे पडत नसतें. अमुक एक प्रघात आज इतकी वर्षे बिनतक्रार चालू आहे, एवढ्याच सबबीवर त्याच्या अधार्मिक स्वरूपाकडे दुर्लक्ष करणें, त्याला ढका लावण्याचे टाळणे, त्याच्यावर सुधारणेच्या सफेदीचा एखादा पट्टा ओढून त्याचें मूळ स्वरूप जाणूनबुजून किंचित् दृष्टिआड करणें म्हणजे संशोधकाची आत्मवंचना होय.
असल्या आत्मवंचकांनी संशोधनाची व सुधारणेची शेखी मिरवण्याचें निंद्य कर्म करण्यापेक्षां झुकत्या दुनियेकडे पहात आढ्याला तंगड्या लावून स्वस्थ बसण्याची मेहेरबानी जगावर करावी. अमूक गोष्ट किंवा विधि हा शुद्ध सामाजिक आहे, रूढीप्रणित आहे, विशिष्ट परिस्थितिजन्य आहे, याचा धर्माशी कांहीं एक संबंध नाहीं, इतकें पटल्यावर त्याचा धर्मकार्यातला संकर तसाच पुढें चालविणें हे दुबळ्या व गुलाम मनाचें चिन्ह होय. मानसिक दास्यांतून मुक्त होणारांनी व इतरांस मुक्त करणारांनी प्रथम स्वयंस्फूर्त स्वतंत्र बनले पाहिजे.
हिन्दुजनांच्या जीवनक्रमांत प्रामुख्यानें तीन विधींचा अंतर्भाव होतो. उपनयन, विवाह आणि अंत्येष्ठी. या व्यतिरिक्त इतर विधि गौण, न केले तरी चालणार आहेत. सोळा संस्कारांच्या अधिकाराबद्दल दंडादंडी व केशाकेशी करणारे कागदी वीर रगड़ असले, तरी प्रत्यक्ष १६ संस्कारांच्या कवायतींतून बिनचूक बाहेर पडलेला षोडश-संस्कारी पठ्ठ्या खुद्द ब्राह्मण्याचें संरक्षण करण्यास धाधावलेल्या ब्राह्मणव्रुवांत एक तरी आढळेल कीं नाहीं, याची शंकाच आहे. मात्र उपनयन, विवाह व अंत्येष्ठी हे तीन विधि यच्चयावत हिन्दुजनांत कांहीं फेरफारानें खास होत असतात.
आद्य हिन्दु मिशनरी गजाननराव वैद्य यांनी हिन्दु मिशनरी सोसायटी स्थापन करण्यापूर्वी जवळ जवळ २४ वर्षे हिन्दू धर्माचा संशोधनार्थ भक्तिपूर्वक स्वाध्याय केल्याचें सर्वत्र महशूरच आहे. त्यांच्या पूर्वी धर्म-विधि संशोधनाचें अद्भुत कार्य श्रीमद्दयानंद सरस्वति या महात्म्यानें केलेंच होतें. धर्मकर्मात अनवश्यक सामाजिक चालीरीतींचा रूढीमुळें जो संकर झाला आहे, त्या संकराच्या कचाट्यांतून वेदांच्या आधारानें उपनयन व विवाहविधीचें शुद्ध धार्मिक स्वरूप निराळें काढण्याचे ध्येय कै. वैद्य यांनीं सतत आपल्यापुढे ठेवून १२ वर्षांच्या अव्याहत प्रयत्नानें सर्व हिन्दूजनांच्या वैवाहिक संस्काराची `वैदिक विवाह पद्धति` व उपनयन विधि अखेर निश्चित केले.
ह्या पुण्यकार्यांत त्यांना स्वाध्यायाच्या जोडीनेंच, लोकमान्यासारख्या लोकोत्तर विद्वानांचे प्रेमळ सहाय लाभलें, ही गोष्ठ सर्वांनी अवश्य लक्षांत घेतली, म्हणजे हे विधि यच्चयावत् हिन्दुमात्रास स्वीकारणीय असेच संशोधित झालेले आहेत, हें निराळें सांगण्याची आवश्यकता उरणार नाहीं. खरें पाहिलें तर कै. वैद्यांनी ह्या विधीत आपल्या पदरचे एक अक्षरसुद्धा घातलेले नाही. विवाह व उपनयन विधींत जो अनेक रूढीजन्य सामाजिक गोष्टींचा संकर झाला होता तो साफ खरचटून निराळा काढला आणि संकरसिद्धि व कायद्याचे परिपालन या दृष्टीने वेदसंमत गृह्यादि सूत्रांत जेवढा भाग आढळला, तेवढाच सुसंगत रीतीने संशोधन करून तो हिन्दुजनांच्या चरणी सेवेला अर्पण केला आहे. विवाहविधींत येणेंप्रमाणे कर्मानुक्रम सिद्ध केला आहे.
१) आवाहन (२) अनुमति (३) मधुपर्क (४) कन्यादान (५) कन्याप्रतिग्रह (६) पाणिग्रहण-प्रतिज्ञा (७) विवाहहोम (८) लाजाहोम (९) सप्तपदी (१०) प्रवेशविधि व (११) शान्तिसूक्त. या विधीविषयी लिहितांना खुद कै. वैद्य २३-१२-१९१८च्या हिन्दु मिशनरीत म्हणतात: "हा विधि आम्ही पुरा जुन्या संप्रदायांतून घेतला. तो तपासून पाहतांना छापलेली पुस्तकें पाहिली व तोंडी माहिती विचारली. सावधान चित्तानें विधीचा एक एक भाग संशोधून पाहिला. संशोधनकर्म पुरे झाले व ॐ तत्सद ब्रह्मार्पणमस्तु हे अन्त्यवचन लिहिलें गेलें त्यावेळी गुरुवार तारीख १९ डिसेंबराच्या (१९१८) रात्री १।। वाजला होता. अनेक दिवसांची चिन्ता अन्त पावली व आमचे चित स्वस्थ झाले.
मद्रास व म्हैसूर येथून दोन पुस्तकें मिळाली. मद्रासचे पंडित ए. महादेव शास्त्री ह्यांनी उपयुक्त माहिती पाठविली आणि `आणखी लागेल ती माहिती विचारा` असे त्यांनी लिहिलें. बळवंतरावजी टिळकांनी विलायतेस जातांना चार पुस्तकें दिलीं तीं उपयोगी पडली. वामनशास्त्री किंजवडेकर यांचा `संस्कार मीमांसा` नामक नूतन ग्रंथ पाठभेद तपासतांना व मंत्राचा अर्थ लावतांना फार उपयोगी पडला. सर्व मंत्र, सांपडले तितके, मूळच्या वेदग्रंथात तपासून पाहिले व पाठभेद दिसला तेव्हां विचार करून मूळचा पाठ आम्ही घेतला.
कायद्याच्या कोटीत हिन्दुविवाहविधिचा कोणता भाग आवश्यक लागतो त्याची चौकशी केली, तेव्हां दानप्रतिग्रह, विवाहहोम आणि सप्तपदी इतकी तीन विधिकर्में झाली म्हणजे काम होतें असें समजलें. मूळ तेवढे आम्हीं ठेवलें आणि आगन्तुक भाग काढून टाकला. रूढीजन्य भाग काढून टाकला तेव्हा थोडे जड वाटले, तरी भावी काळाकडे व तत्वांकडे पाहून शस्त्रवैद्याप्रमाणे प्रेमाची सुरी हातांत घेऊन अति निष्ठुर प्रेमानें आम्ही शस्त्रप्रयोग केला. त्याचा उपयोग पुष्कळांना होईल आणि सुविद्य जनांना साध्या विधीपासून समाधान होऊं लागेल.
सांप्रतच्या रूढ विवाहविधींत अनवश्यक सामाजिक गोष्टींनीं भयंकर घोटाळा उडविला आहे व त्यामुळे विवाहविधीचा शुद्ध हेतु व संस्कारपरिणाम साफ विनष्ट झाला आहे. इतकेंच नव्हे तर खुद्द विवाहपद्धतसुद्धां उलटी पालटी होऊन बसली आहे, हें किंचित् चिकित्सक दृष्टीनें प्रचलित विवाहविधि पहाणारांच्या तेव्हांच लक्षांत येण्यासारखे आहे.
जिज्ञासु तरुणांनी व विचारवंत पोक्त जनांनी ह्या बाबतींत विचारणा करणे आवश्यक आहे. कै. गजाननराव वैद्य म्हणतात:- "मराठी प्रांतांत सांप्रत जो विवाहविधि होतो तो अशास्त्र असलेला दिसतो. छापील पुस्तकें पाहिली तर त्यांत कोठेही विधिकर्माची व्यवस्थित मांडणी केलेली दिसत नाहीं. प्रत्यक्ष व्यवहारांत अंतर्पाटापासून आरंभ होतो आणि मंगलाष्टक नामक आशीर्वादाचे आठ श्लोक पुरोहित म्हणतात आणि `लग्न लागलें` असें समजून साक्षीजन निघून जातात. अहो, जेथें `कन्या देतो` असें कन्यादान झालें नाहीं आणि वराने `घेतो` म्हटलें नाहीं, तेथें `लग्न लागलें` कोणाचें आणि कोणत्या मंत्रांनीं? `लग्न लागलें` नाहीं तेथें मंगलाष्टके अयोग्य वेळीं कशी यावीं? ह्याचा विद्वज्जनांनीं विचार करावा."
हें मंगलाष्टकांचें खूळ आणि त्यामुळे सबंध विधीची झालेली अमंगल उलथापालथ पाहून एकाहि विचारी हिन्दूच्या चित्ताला संशयाचा धक्का बसूं नये किंवा त्याला हे असें कां? विचारण्याचें धैर्य होऊ नये ह्या स्थितीला मानसिक गुलामगिरीपेक्षा दुसरें काय नांव द्यावें? कै. वैद्य पुढे म्हणतात, “बहुतेक सर्व साक्षीदार निघून गेल्यावर `कन्यादान + होम + सप्तपदी = विवाह` हा अत्यंत महत्वाचा प्रकार कसा तरी होत असतो. त्यावेळीं वधूवरांपाशीं थोडींच माणसें असतात व बाकीचे, विवाहाला (म्हणजे `कन्यादान होम सप्तपदी` ह्याला साक्षीस रहाण्यास आलेले जन नारळ घेऊन परतलेले असतात किंवा भोजनकर्मांत गुंतलेले असतात. आमच्या सुंदर विधीची अशी ही दुर्दशा असावी ना? विद्वज्जनहो जरा इकडे पहा तरी?"
वधुवरांच्या कुंडल्या एकमेकांशी घांसून त्यांतून षडाष्टकें खडाष्टकें एकनाडी दोन नाडी वगैरे प्रकार डोंबाऱ्याचा पातड्यांतल्या हाडांप्रमाणे काढण्यांतच आपल्या पोक्तपणाच्या वडीलगिरीचे चोज पुरविणारांनी या मंगलाष्टकांच्या अगंतुकपणाचा अवश्य विचार केला पाहिजे. उपनयन विर्धीत हीं अष्टके मुलाचें लग्न बापाशीं लाऊन विवाहकर्मात विधीची शास्त्रशुद्ध, तर्कमान्य व विवेकमान्य सांगता होण्यापूर्वीच `विवाह लागला` अशी अक्षरशः असत्य जबानी देत असतात.
समजा, `शुभमंगल सावधान`ची `जयघंटा` ठणाणताच हातांत पडलेले नारळ घेऊन `लग्न लागले` असे जाहीर करणारे साक्षीजन घरोघर परतल्यावर, दान प्रतिग्रहादी मुख्य विधि उरकण्यापूर्वीच जर वराचें अकस्मात् `हार्ट फेल्यर`नें प्राणोत्क्रमण झाले, तर हे साक्षीजन किंवा मंगलाष्टकाच्या अशास्त्रीय बेंडबाजानें `लग्न लागले` असें मानणारे वधुवराचे आईबाप त्या वधूला विधवा समजणार की कुमारिका समजणार? यावर शास्त्रीबुवा जेहत्ते निर्णय देणार की `सप्तपदीशिवाय विवाह सांग व संपूर्ण होत नाहीं;` जर होत नाहीं तर, `लग्न लागलें` असें आधीच जाहीर करून साक्षीजनांची बोळवण तुम्ही कां केलीत? आतां तुमचा निर्णय खरा मानावा की साक्षीजनांनी `लग्न लागले` हा गांवभर पुकारलेला डंका खरा मानावा?
सारांश विवाहासारख्या अत्यंत महत्वाच्या मनःसंस्कारकारक, उत्क्रांतिकारक व गंभीर अशा विधीत सुद्धां आम्ही असत्याची भेसळ करण्यास मागें पुढे पाहात नाही! दुसरी गोष्ट मुहूर्ताची. ज्योतिषीबुवा वधुवरांच्या कुंडल्यांची घासाघीस करून त्यांतून निश्चित असा मिनिट सेकंडवार मुहूर्त काढून देतात. मंगलाष्टकांच्या वेळी अनेक स्नेहीजन खिशांतलीं घड्याळें मुठीत धरून, किंवा रिस्टवॉचबद्ध मनगटें आडवीं धरून मिनिट सेकंद कांट्यावर अट्टल डिटेक्टिवाप्रमाणे `डोळा धरून` उभे असतात. ठराविक मुहूर्ताच्या आधीच मंगलाष्टकांचे आठ श्लोक संपले तर `भटजी अझून दोन मिनिटें आहेत, चालूं द्या` असा त्या मंगलाष्टक्याला इषारा होतो.
भटजीना काय? ते लागलीच मंगलाष्टकांची द्वितीयावृत्ती सुरू करतात किंवा वधुवराचा एखादा `विशेष शहाणा` स्नेही `वेळ मारण्या करितां` (To kill the time?) ज्याच्या मस्तकिं दीर्घ नूतन जटाफेंटा दिसे टोप तो, हा किंवा असलाच एखादा मराठी श्लोक मोठ्या खड्या सुरांत म्हणण्याची तसदी घेतो आणि घड्याळाचा कांटा ठराविक मिनिट सेकंडवर येतांच सर्वजण टाळ्यांचा कडकडाट करून, ताशे चौघड्याच्या धडाक्यात `लग्न लागलें` असे जाहीर करातात. परंतु, खरा विवाहविधि म्हणजे दानप्रतिग्रह सप्तपदी इ. भाग पुढें केव्हांतरी निवांतपणे उरकीत असतांना, खुद्द ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनें जरी व्यतिपात वैधृतीचा काळ सुरू असला तरी, त्याची दिक्कत खुद्द ज्योतिषीबुवा किंवा कोणीही बाळगीत नाहीं. म्हणजे मुहुर्ताचें अनावश्यक दास्य पत्करूनसुद्धां विवाहविधी ठराविक मिनिट सेकंदांवर घडून येत नाहींत ते नाहींतच! अशा परिस्थितींत
जोशी पंचांग पहाती । मग कां बालविधवा होती ।।
ही तुकोक्ती कोणत्या विचारवंताला आठवणार नाहीं? खरें पाहिलें तर मूळच्या वेदोक्त विवाहविधींत अंतर्पाट किंवा मंगलाष्टके ह्यांचा कांहींच मागमूस लागत नाहीं. विधीच्या शुद्ध क्षेत्रांत सामाजिक चालीरीतींनीं व प्रांतविशिष्ट रूढींनीं दंगल माजविल्यानंतरच हा मंगलाष्टकाचा लटका बांडगुळ्या प्रघात विवाहविधीच्या बोकांडी बसला आहे. मंगलाष्टकें म्हणून विवाहाची सिद्धी होत नाहीं किंवा कोठच्याहि दृष्टीनें त्यांची आवश्यकताही सिद्ध होत नाहीं. तो एक मूर्खपणाचा प्रकार आम्ही हिन्दुजनांनी हकनाक आपल्या डोक्यावर चढविलेला आहे.
याबद्दल लिहितांना कै. वैद्य मोठी मार्मिक टीका करतात. "मूळच्या विधींत मंगलाष्टकें नाहींत. सगळाच विधि मंगल व पुण्यप्रद आहे. शेवटीं `स्वस्त्यस्तु` येतें. मूळचा विधि गंभीर, मनःसंस्कारकारक, असा असून तो शांतपणे व्हावयास पाहिजे. एके प्रकारचीं आमच्या पहाण्यांत आलेलीं मराठी मंगलाष्टकें म्हणतात त्यांची भाषाहि शुद्ध नाहीं, व कसेतरी कुर्यात् सदा मंगलम् असें प्रत्येक श्लोकाच्या शेवटीं ठेवून दिलें आहे. कुर्यात् या एकवचनी क्रियापदाचा कर्ता बहुवचनी आला आहे. तरी कोणाला विचार करण्याची व आपला परम मंगल विवाहविधि संशोधून पहाण्याची आवश्यकताच वाटत नाहीं. कसें तरी एकदां `लग्न लागलें` म्हणजे झालें. अशीच निष्काळजीपणाची प्रवृत्ति फार पटेल स्मृतीसारखा विषय पुढें आला म्हणजे जो तो धर्माची मोठी काळजी दाखवितो, पण शंकराचार्यासारखे असामी देखील विधि संशोधून देत नाहींत. विधीच्या प्रकारांत पुस्तकें पाहिलीं व आचार पाहिला म्हणजे असें दिसतें कीं गौण गोष्टींना महत्त्व फार दिलें आहे व तसाच प्रकार अंध गतानुगतिकतेनें चालू ठेवण्यात आला आहे.
विवाहविधींत गडबड, गोंगाट, वाजंत्री, पैशाचा अपव्यय हेच प्रकार फार. शांति नाहीं, गंभीरता नाहीं, विधीचा मान नाहीं, विवाहकर्माचा कोणताच भाग झाला नाहीं तोंच मंगलाष्टकें! `चवदा कुर्यात्` `हे कुर्यात्` `इतकीं कुर्यात्` `हे दहा अवतार कुर्यात्` असे सदोष प्रयोग त्या मंगलाष्टकांत. तिसऱ्या श्लोकांत तर `कुर्यात्` या क्रियापदाचे जे कर्ते आहेत त्यांत `हाहा हुहू` नामक गंधर्व आहेत. ज्या गंधर्वाच्या गांधर्वविवाहांत व्यवस्थित विवाह नाहीं, ते आमच्या वधूवरांना पांचजन्य, धनु, रंभा, कुंजर, सुरा (दारू), चारण, यक्ष, अश्वास्य, नद्या, नगरें, अजून न झालेला कलंकी (कल्किः), असे हे आशीर्वाद देणार! हा विवाहविधिविषयींचा प्रकार जर आजच्या सुविद्य मुलांना व मुलींना समजेल तर त्यांत जे मानी जीव आहेत ते आपला विवाह अशा रीतीनें कधींहि करून घेणार नाहींत. हिन्दू जनांनीं याचा विचार करावा आणि आपल्या वेदप्रणित सुंदर विवाहविधिकर्मांचे संशोधन करावें."
कै. वैद्य `संशोधन करावें` असें जें म्हणतात तें त्यांच्या शालींन्याचे द्योतक आहे; वास्तविक हें दुष्कर कार्य त्यांनी अत्यंत मेहनतीनें सुकर करून हिन्दु जनतेपुढे आहे. आधी केले आणि मग सांगितलें. आज त्यांच्या संशोधित विवाहविधीप्रमाणे ठिकठिकाणीं विवाह होत आहेत. ज्यांनी ज्यांनी ही पद्धत पाहिली त्यांनी तिची मुक्त कण्ठानें स्तुतीच केली आहे आणि दिवसें दिवस तिचा प्रसार सुविद्य व समजस तरुण तरुणींत होतच आहे. आजपर्यंत ब्राह्मण, कायस्थ प्रभु, मराठे क्षत्रिय, इ. अनेक जातींत ह्या पद्धतीनें बरेच विवाह लागले आहेत. ह्या विधीचीं छापील पुस्तकें आज दोन वर्षे छापू घातली आहेत. कै. वैद्यांच्या ध्वजधारकांनी ह्या कार्याचे महत्त्व जाणून, हा विधीं शक्य तितक्या लवकर छापून प्रसिद्ध करावा, अशी आमची त्यांस आग्रहाची विनंती आहे.
****
कै. ग. भा. वैद्य संशोधित वैदिक विवाहाचा कायदेशीरपणा
श्री. चौबळ यांनीं आपल्या `हिंदु वैदिक विवाह पद्धतीचे परीक्षण` या पुस्तकांत जे पुष्कळसे निरर्थक मुद्दे उभारून बरेच भारूड केलें आहे त्याची योग्य ती संभावना होतच आहे. शास्त्र म्हणजे काय, हिंदू कोणास म्हणावे, ब्राह्मण कोण वगैरे कित्येक गोष्टींचा त्यांत उहापोह केलेला आहे. जुन्या विधीपैकी कांही गोष्टी कमी केल्या आहेत, सोसायटीच्या विवाहपद्धतीत ब्राह्मण असतोच असें नाहीं, असल्या शंका पाहिल्या म्हणजे खरोखरीचं हा रिकामा उपद्व्याप आहे असेंच वाटते. ब्राह्मण नसला तर विवाह अशास्त्रीय किंवा बेकायदेशीर ठरतो असे उघडपणें म्हणण्याची मात्र त्यांना हिंमत नाहीं. पण थोडाशी खुसपट काढून, ब्राह्मण, द्विज ह्यांच्या व्याख्यांची चर्पटपंजरी वळून, `थोडीशी शंकास्पद गोष्ट आहे, याचा नीट विचार व्हावा` वगैरे लांड्या कारभाराचे कोटीक्रम त्यानीं लढविले आहेत.
शेवटीं शूद्राला तर बाजूला टाकून स्वारी वेदोक्ताच्या बाबीवर घसरली आहे. वैदिक अधिकार असणाऱ्या जातीनीं विवाह लावला तर चौबळांची फारशी हरकत नाहीं असें दिसते. पण आज क्षत्रिय वैश्यपणाबद्दल इतके तंटे उपस्थित झाले आहेत कीं, याचा शेवटला निर्णय देणार कोण? प्रभू मराठा वगैरे जातीना अद्याप क्षत्रिय मानण्यास अझूनहि कित्येक नाखूष आहेत. तर कांहीं कट्टर जीर्ण ह्या कलियुगांत क्षत्रिय व वैश्य मुळीं नाहींतच हा महामंत्र उराशी धरून पुढें येतील आणि म्हणूनच मला वाटते श्री. चौबळानीं सध्या ब्राह्मणांकडूनच लग्ने लावावी असला बुरख्याचा उपदेश हळूच केला आहे. ही शुद्ध गुलामाची मनोवृत्ति आहे, या शिवाय दुसरें उत्तर नाहीं.
पण ह्या पुढे श्री. चौबळानीं आणखी एक शस्त्र काढलें आहे. या कलियुगांत तरुण लोक सगळे धर्मलंड बनत चाललेले, त्यांना शास्त्राची मातब्बरी काय होय? शास्त्र धाब्यावर बसविणारे चवचाल लोक हे! तेव्हां त्यांनी आपल्या पोतडींतून विसाव्या शतकाला योग्य असें शस्त्र काढलें. आमचे शास्त्र राहिलें, पण कायद्याकडे तरी नीट पहा, हे लोक कांही जरूर सगळे विधी करीत नाहींत. विधिकर्माला ब्राह्मण असतोच असें नाही. तेव्हां नीट विचार करा. नाहींतर तरुणपणाच्या धडाडत तुम्हाला वाटेल कीं आम्ही मोठी सुधारणा केली. पण एखादे वेळेस प्रसंग यावयाचा व मग न्यायाच्या दरबारांत तुमचा विवाह बेकायदेशीर ठरेल, तुमच्या पत्नीचें पत्नित्व जाऊन तिला रखेलीचे पद प्राप्त होईल व मग तुमच्या पोराबाळांचे व इस्टेटीचे ते धिंडवडे कोण वर्णन करणार? तेव्हां संभाळा.
एकादा ठाकरे, राजे किंवा वैद्य तुमचें मन वळविण्यास आलाच तर त्याला थोडा थोपवून धरा आणि एकदम वकीलाकडे धांव मारा. त्याचा नीट सल्ला घ्या. आणि मग ही अंधारांत उडी घ्या, असें चौबळांचे अक्रोशपूर्वक म्हणणे आहे. मला श्री. चौबळानाच असें सांगावयाचे आहे की हीं पाने खरडण्यापूर्वी तुम्हीच एकाद्या वकीलाची सल्ला घेतली असती तर तुमचे हे श्रम खास वाचले असते. न्यायकोर्टाला विवाहाचें गांभीर्य तुमच्यापेक्षा नीट समजते. एखादी गौणगोष्ट नसली की ठरव तो विवाह बेकायदेशीर इतकें तें चवचाल नाहीं. लांबलचक व अवघड विधीनेंच गांभीर्य येतें असली खुळचट कल्पना त्याची नसतें. हा अजब तर्कशोध श्री. चौबळ रजिष्टरांचाच दिसतो.
विवाहविधी सोपा असला म्हणजे नीतीमत्तेला म्हणे शिथिलता येते. काय पण तत्व आहे! मारे दोन दिवस सारखा विवाहविधी चालवावा, वधूवरांना सर्कशीतील अवघड फीट्स करण्यास लावाव्या, उपाशी तापाशी उभे ठेवावे, मग काय बिशाद त्यांची वैवाहिक नीती बिघडायची! अगदी जन्मभर नातिचरामिचें पालन! तुमचा विधी चार तास काय पण चार दिवस चालला आणि पोपटासारखी संस्कृतमध्यें सारखी ब्राह्मणपंची चालू राहिली, (न समजणारे मंत्र म्हणावयाचे मग नुसतें दुसरेही काहीं खुशाल काढावे. मुहूर्ताची वेळ होईपर्यंत मंगलाष्टकांत वाटेल ते श्लोक दडपतातच कीं नाहीं? गीतगोविंदातील राधाकृष्णाच्या चवचाल प्रेमाचा श्लोक मंगलाष्टकांत मीं ऐकला आहे.) म्हणजे एकाद्या पाजी माणसाचे पाय वेश्यांचे जिनें चढावयास मोडतात होय? हें तर्कशास्त्र कुठल्या कोटींतलें?
आतां, आपण विवाह कायदेशीर होण्यास लागतें तरी काय हे एकदा पाहू, हे नीट पाहिलें की ह्या प्रश्नाचा निकाल लागलाच. लग्नविधीसंबंधाने विचार करतांना एक गोष्ट स्पष्टपणे लक्षांत घेतली पाहिजे, जुनेपुराणे शास्त्रविहित विधी आतां जवळ जवळ नष्ट झालें आहेत. कन्या पसंत करण्यापासून ते गृहप्रवेशापर्यंत किती तरी विधींचा समावेश त्यांत होतो. कै. श्री. मंडलीक यांनी आपल्या Hindu Law मध्यें असले शास्त्रशुद्ध (?) विधी २७ प्रकारचे सांगितले आहेत. त्यापुढेंच त्यांनी सांगून टाकलें आहे कीं, हे आतां कोणी पाळीतहि नाहींत व त्यांची जरूरीहि नाहीं. जरूरीसंबंधाचा पुढेच उल्लेख आला आहे:
`There are places where hardly a qualified Brahmin priest is obtainable, and parties have to improvise a ceremonial for themselves.`
(Mandlik Hindu Law-402)
स्मृतीनें सांगितलेला विवाह होमहि कित्येक ठिकाणी केला जात नाही. निरनिराळ्या सर्व विधींतून सप्तपदीचा विधीच काय तो जरुरीचा मानला जातो. पण तो सुद्धा वेगवगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रीतीनें आचरला जातो. त्यांतसुद्धा सर्व ठिकाणीं एकवाक्यता नाहीं. देशांत लग्नविधीसंबंधानें एकंदर इतकी विविधता दृष्टीस पडते कीं, एका नियमाच्या सूत्राने त्यांना बांधू पहाणें हे अगदी हास्यास्पदच काय पण मूर्खपणाचेहि होईल. आज जरी सर्वांकरितां ब्राह्म व असुर हे दोनच विवाहप्रकार चालू व कायद्याला मान्य आहेत, तरी कोठें कोठें गांधर्व पद्धतहि प्रचारांत असलेली दृष्टीस पडते.
वराच्या कट्यारीशी होणारें लग्न, कोठल्याहि धार्मिक संस्काराशिवाय मृत पतीच्या भावाशी वा आप्ताशी होणारा पंजाबातील `करेवा`, जाटांतील `कराव घुरीचा`, शिखांतील `आनंद` किंवा ज्यांना खरोखरी स्त्रीपुरुषसंयोग हेंच नाव योग्य आहे, पण त्या त्या समाजांत अगदीं उघड्या डोळ्यानें कायदेशीर मानले जातात असे पंजाबातील `चामर अंदाझी` किंवा मलबारातील `संबंधम्` हे सर्व प्रकार पाहिले म्हणजे वरील म्हणण्याची सत्यता ताबडतोब निदर्शनास येईल. सांगण्याचा मुद्दा एवढाच कीं, सर्व ठिकाणीं लागू पडेल व कायद्याचे दृष्टीनें ज्याची आवश्यकता आहे असा एकच विधी हिंदूविवाहाकरितां उरलेला नाहीं.
No prescribed ceremony is necessary to constitute marriage, provided that if any ceremony is customary and regarded by the caste as essential then it must be performed.
Explanation
I. the ceremony of saptpadi is necessary to complete a marriage performed according to the orthodox rites and that of विवाहहोम is also usually performed but their nonperformance does not invalidate a marriage if otherwise complete.
II. A marriage celebrated with due ceremony is not invalid by reason of the fact that a party thereto was then an outcaste.
(Hindu Code- Dr. H. S. Gour)
सर शंकरन नायर यांनी एका केसमध्यें याच तऱ्हेची विचारसरणी अंगिकारिली आहे. Hindu lawyers prescribed various ceremonies to constitute a valid marriage. But those ceremonies in their entirety are seldom, if ever, performed. According to them the विवाहहोम and सप्तपदी are essential. But it is notorious that marriages are performed in many castes with out them, and it is now settled that if by caste usage any other form is considered as constituting a marriage then the adoption of that form- with the intention of thereby completing the marriage union- is sufficient.
(Mutthuswami v. Masilamni 33 M. 342)
तेंव्हा एक गोष्ट उघड झाली कीं, लग्न कायदेशीर होण्यास त्या त्या प्रान्तातल्या चालीरीतीनें अवश्यक व सोईवार असतील तेवढे विधी केले म्हणजे बस्स आहे. शास्त्रातील विधी अजीबाद बाजूला सरले आहेत, व ठराविक असा एकच विधी नाहीं.
सध्याच्या परिस्थितीत आपल्याकडे विवाह कायदेशीर होण्यास पुढील गोष्टींची आवश्यकता आहे:
१. वधू व वर एकाच जातीचे पाहिजेत. भिन्न पोटजातीचे असले तर चालतील. चुकून जरी असें (पोटजातीचें) लग्न लागलें तरी तें मोडणार नाहीं.
२. वधू आणि वर हे शास्त्रांनी निषिद्ध मानलेल्या नात्यांतील असतां उपयोगी नाहीत. म्हणजे ते सपिंड किंवा सगोत्र असतां कामा नये. स्मृतिग्रंथांनीं आणखीहि पुष्कळ नात्यांचे निर्बंध घातलेले आहेत. पण रूढीने ती बंधनें आतां बरीच सईल केली आहेत. शास्त्रस्मृतींच्या व्याख्यांप्रमाणें आणि निर्बंधानुसार जवळ जवळ २१०० नाती निर्बंधात काढली आहेत. युरोपियन समाजात अशीं ३० सांपडतील. ह्या बाबतीत एक गोष्ट लक्षांत ठेवावयास पाहिजे. लग्नाच्या बाबतींत हीं निषिद्ध नातीं चालीरीतींनीं ठरविली जातात. खुद्द स्मृतिकारांचा एकमेकांशीं मुळींच मेळ नाहीं. तेव्हां स्थानानुसार वा जातींच्या रूढी प्रमाणें निरनिराळ्या ठिकाण निरनिराळी नाती अयोग्य समजली जातात.
`The question of a proper or an improper marriage is therefore always one of usage, to be determined according to the people`s achar (आचार)`
(Mandlik`s Hindu Law, 414)
३. फसवणुकीनें किंवा जबरदस्तीनें विवाह होता कामा नये. अर्थातच तक्रार करणाराला या बाबतीचा फायदा देतांना न्यायकोर्टाला फार जपून वागावें लागतें.
४. कायद्याप्रमाणे आवश्यक अशा विधींचें पालन झालें पाहिजे. कायद्याप्रमाणें आज दोन विधींचे परिपालन जरूर आहे. श्री. चौबळांनी म्हटल्याप्रमाणें चार पांच विधींची मुळींच जरूरी नाहीं. हे दोन विधी म्हणजे (१) विवाह होम आणि (२) सप्तपदी हे होत.
There are two ceremonies essential to the validity of a marriage, whether the marriage be in the Brahma form or the Asura form namely -
(i) Invocation before the sacred fire and
(ii) Saptapadi. The marriage becomes completed when the seventh step is taken; till then it is imperfect and revocable
(Justice Mullah)
(एक गोष्ट येथें लक्षांत घेतली पाहिजे. एखाद्या जातींत उपरोक्त विधीव्यतिरिक्त कांहीं विशिष्ट विधीनीं विवाह मान्य होत असला तर तेथें या दोन विधींचे परिपालन झालें नाहीं तरी चालतें. कालीचरण * दखी ५ क. ६९२; रामपियार * देवराम (१९२३) १ रंगून)
ह्या दोन विधींतून सप्तपदीचा विधीच काय तो जास्त महत्वाचा आहे. कायद्याच्या दृष्टीने याची आवश्यकता तर आहेच, पण स्मृतीग्रंथांनीहि याला महत्त्व दिले आहे.
"पत्नीचें नातें ज्या वेळेस वर वधूचा हातानें स्वीकार करतो त्यावेळेस उत्पन्न होतें. हे ध्यानांत घरले पाहिजे की, विद्वानांच्या मर्ते या मंत्राची पूर्तता सप्तपदीच्या मंत्रपूर्ततेबरोबरच होते."
- मनु.
"जलप्रोक्षण करून किंवा कन्यादानाचे शब्द उच्चारून पतिपत्नीचें नाते उत्पन्न होत नाहीं. तर तें ज्यावेळी वर वधूचा हात आपल्या हातांत घेतो व ते एकमेकांबरोबर सातवें पाऊल टाकतात त्याच वेळीं होतें."
- यम.
ही सप्तपदी कशी करावयाची ह्यांत निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे फरक आहेत. पण फरक असले तरी त्याची आवश्यकता मात्र आहे. (अपवाद वर कंसांत उल्लेखलाच आहे.)
कायद्याला कशाची जरुरी आहे हे आता अगदी स्पष्ट झालें. विवाहांत रूढीनुसार पुष्कळ भारूड गौण गोष्टींचा गोंधळ झालेला असतो.. विशिष्ट जातीत विशिष्ट चालीरीती प्रत्यहि आचरतांना आढळण्यात येतात. पण असल्या गौण गोष्टी राहिल्या म्हणून त्यानें विवाहाला कोणत्याहि प्रकारचा बाध येत नाही. एवढेच काय पण एखादा विधी चुकून राहिला तरी सुद्धा विवाह बेकायदेशीर होत नाही. न्यायकोर्टांना विवाहाच्या गांभिर्याची चाड असते. संतती झालेली असल्यास कोर्ट या बाबतीत जास्तच काळजीपूर्वक वर्तन करते. वाटेल त्या क्षुल्लक गोष्टीकरितां विवाह बेकायदेशीर ठरू लागले तर अनवस्था प्रसंगच प्राप्त व्हावयाचा.
`Quod non debut factum valet` (What should not be done, yet being done shall be valid) हे कायद्याचे सूत्र हिंदु विवाहाच्या बाबतीत लागू पडतें. जिम्मूतवाहनानें `दायभाग` मध्ये हैं तत्व प्रतिपादिलें आहे. त्याप्रमाणें विज्ञानेश्वरानेंहि `मिताक्षरा` मध्ये याला मान्यता दिलेली आहे. भिन्न जातींत किंवा सपिंड वगैरे निषिद्ध नात्यांत विवाह झालेला असला तरच तो कोर्ट बेकायदेशीर ठरवील. कोर्ट या बाबतींत कोणत्या प्रकारची दृष्टी ठेवते याबद्दल डॉ. गौर म्हणातात:
"But before it can be avoided the court must be satisfied of violation of some substantial right and material prejudice, otherwise it will condone mere irregularities, omissions and errors of procedure which could not be permitted to affect such solemn obligations as those of marriage: quod fiery non debut factum valet."
(Hindu Code - Dr. H. S. Gour)
एवढेंच काय पण कायदा याहीपुढे जातो. गृह, कुटुंब, असल्या पवित्र संस्थांच्या स्थैर्यावर समाजाची घटना अवलंबून असते. आणि समाजघटनेच्या रक्षणासाठीच कायद्याचा अवतार असतो. म्हणून फक्त बरीच वर्षे पति - पत्नीच्या नात्यानें दोघांची नांदणुक झाली होती, सर्व व्यवहार याच तऱ्हेनें उघडपणे चालले होते, यावरून ती बाई त्याची पत्नीच असली पाहिजे, निदान तिला ते अधिकार प्राप्त झाले होते व त्याचा फायदा तिला अवश्यमेव मिळाला पाहिजे, असा निकाल या बाबतीत झालेला आहे.
दलिपकुंवर व फत्ती (बाई लालकुंबर) ह्या प्रसिद्ध केसमध्ये प्रिव्ही कौन्सिलने वरीलप्रमाणें निकाल देऊन तिच्या मानीव नवऱ्याच्या इस्टेटीवरील तिचा हक्क मान्य केला आहे. (Dilip Kuvar v. Fatti 1913 P. R. 99; 18 I. C. 930) अशाच एका दुसऱ्या केसमध्यें (शास्त्री डसांबकट्टी) प्रिव्ही कौन्सिलचा निकाल सांगतांना सर बर्नेस पिकॉक यांनी याचे पूर्ण विवेचन केलें आहे.
"Law presumes and presumes strongly in favor of marriage from the fact of continuous cohabitation conduct and repute. The evidence for the purpose of repelling it must be strong, distinct, satisfactory and conclusive."
पण या गोष्टीशीं आपल्याला विशेष कर्तव्य नाहीं. मला सांगावयाचें एवढेच कीं, कायद्याची दृष्टी इतकी गंभीर व व्यापक आहे कीं, गौण परंपरागत गोष्टींनी विवाहाच्या कायदेशीरपणाला प्रत्यवाय येणें मुळींच शक्य नाहीं.
श्री. चौबळांनी याचा जो एवढा मोठा बाऊ केला आहे त्याच्या मुळाशी प्रबोधनने म्हटल्याप्रमाणें रिकाम्या न्हाव्याची उपद्व्यापी वृत्ती किंवा मनाची गुलामगिरी या व्यतिरिक्त कांहीं असू शकेलसें वाटत नाहीं. तेव्हां असल्या बुजगावण्यानें कोणी बुजून जाण्याचें मुळींच कारण नाहीं.
(एम.ए., एल.एल.बी.)
****