वक्तृत्व कला आणि साधना
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
वक्तृत्व कला आणि साधना
वक्तृत्वशास्त्र या गाजलेल्या अंकाची सुधरित नवी आवृत्ती
लेखक
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे
प्रकाशकः निर्णयसागर प्रेस, मुंबई
वक्तृत्वशास्त्र या पुस्तकाचे प्रकाशक : चित्रशाळा प्रेस, पुणे
प्रकाशन : १० मे १९७०
वक्तृत्वशास्त्र या पुस्तकाचे प्रकाशक : १३ मे १९१८
प्रस्तावना
वक्तृत्व माझ्या जीवनातला अतिशय आवडीचा विषय. या विषयावरचे `माझे वक्तृत्वशास्त्र` हे पुस्तक दि. १३ मे सन १९९८ रोजी अक्षय तृतीयेला प्रसिद्ध झाले. या पुस्तकाचा बॅ. जयकर, सौ. काशीबाई हेर्लेकर, भारताचार्य चिंतामणराव वैद्य, रायबहाद्दूर गुप्ते, पि. विष्णू मोरेश्वर महाजनी, रावसाहेब गोविंदराव कानिटकर, डॉ. कुर्तकोटी (शंकराचार्य), `काळ`कर्ते अण्णासाहेब परांजपे वगैरे त्या काळच्या थोर पुढाऱ्यांनी फार मोठा गौरव केला. शेकडो विद्यार्थी, शिक्षक आणि कॉलेजातील वक्तृत्वसभांनी या पुस्तकाचा टेक्स्ट बूक म्हणून आस्थेने अभ्यास केला. सध्या ते पुस्तक दुर्मिळच आहे.
प्रस्तुत `वक्तृत्व कला आणि साधना` ही वक्तृत्वशास्त्राची ५२ वर्षांनंतर निघणारी दुसरी आवृत्ती म्हणण्यापेक्षा, वक्तृत्व विषयाच्या सांगोपांग चर्चेसाठी देशकालवर्तमानानुसार अगदी नव्यानेच केलेला दुसरा प्रयत्न असे झाल्यामुळे तर वक्तृत्वविषयक जुन्या नियमात आरपार बदल झाला. प्रस्तुतच्या पुस्तकात वक्तृत्वाची शैली कमावतानाच, शीलसंवर्धनाच्या आणि भाषाशैलीच्या केलेल्या अनेक सूचना उदयोन्मुख तरूण पिढीला मार्गदर्शक ठरतील असा मला विश्वास वाटतो. या पुस्तकाची रचना करताना माझा ६० वर्षांचा `वक्ता` या नात्याचा अनुभव नि तपश्चर्या मी ओतली आहे.
प्रस्तुत पुस्तकाचा अखेरचा भाग पुरा करीत असतानाच एकाएकी माझी दृष्टी विलक्षण मंदावली आणि जवळजवळ मी आंधळाच झालो. त्यामुळे पुस्तकाच्या छपाईची मुद्रणे तपासणेही मला अशक्य झाले. अशा बिकट अडचणीच्या प्रसंगी माझे शिष्य श्री. पंढरीनाथ सावंत यांनी ते काम नेकीने सफाईदार पार पाडले. अंधावस्थेचा अनुभव एक वर्ष घेतला. त्यातून माझी सुटका नेत्रशास्त्रनिपुण डॉ. श्रीधर विठ्ठल ओक यांनी नुकतीच केली. ठाकरे घराणे आणि डॉ. ओक यांचा ऋणानुबंध अत्यंत जिव्हाळ्याचा. माझ्या आयुष्यात मला आंधळ्याचा धडसा करण्याची डॉ. ओकांची ही तिसरी वेळ. त्यांच्याविषयी माझी कृतज्ञता अबोल झाली आहे.
उभ्या हयातीत कमीत कमी ७० वर्षे मायबोलीद्वारे तरुण मनाचे सर्व क्षेत्रीय प्रबोधन करण्यात वाणी लेखणी झिजवली. थोड्याच महिन्यात मी आयुष्याचा ८५ वा मैलाचा दगड ओलांडणार. (असे आज तरी वाटते. भविष्योत्तर कोणी अंदाजिले आहे?) मऱ्हाठी जनतेची आजवर केलेली सेवा मी स्वतःच्या समाधानासाठी केली. कसल्याही शाबासकीसाठी नव्हे. एखाद्या आवडीच्या विषयावरील ग्रंथाची दुसरी आवृत्ती तब्बल ५२ वर्षांनी लेखकाच्या हयातीत प्रसिद्ध व्हावी, ही लहानसान समाधानाची गोष्ट खचित नव्हे.
निर्णयसागर छापखाण्याचे तरुण नि उत्साही व्यवस्थापक श्री. पांडुरंगराव मोरे यांनी आपुलकीने प्रस्तुत पुस्तकाचे प्रकाशन हाती घेऊन कै. रामचंद्र येसू शेडगे यांच्या नि माझ्या जुन्या ऋणानुबंधांवर शिक्कामोर्तबच केले.
महाराष्ट्राचा विनम्र सेवक
केशव सीताराम ठाकरे
दिनांक १० मे सन १९७०
`मातोश्री`
२५. कलानगर, वान्द्रा पूर्व,
मुंबई ५१.
प्रकरण १
वक्तृत्व : शास्त्र का कला?
केयूरा न विभूषयन्ति पुरुषं हारा न चन्द्रोज्ज्वला
न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजाः
वाण्येका समलंकरोति पुरुषं या संस्कृता धार्यते
क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम्
- भर्तृहरि नीतिशतकम्.
(बाहुभूषणांनी, चंद्रासारख्या तेजस्वी हारांनी, गंधादि लेपनाने, फुलांनी किंवा केशसंस्काराने पुरुषाला शोभा येत नसून, संस्कारयुक्त वाणीनेच तो शोभा पावतो. कारण, वरील सर्व भूषणे अल्पजीवी असून, वाणीचे भूषण मात्र चिरंजीव होय.)
वक्तृत्व ही कला आहे का शास्त्र आहे? कोणतीही कला घ्या, तिला आधी काहीतरी ठरावीक नियमांची शास्त्रीय बैठक हवीच हवी, असा सिद्धांत मांडला तर कला आधी का तिचे शास्त्र आधी, असा प्रश्न पुढे उभा राहतो. कोंबडे आधी का अंडे आधी? झाड आधी का बीज आधी, इतका काही हा कोडेबाज सवाल नाही. वक्तृत्व म्हणजे वाग्विलास, वाणीचा विलास. आधी वाणी नंतर तिचा विलास आणि त्यानंतर त्या विलासाच्या मर्यादा नि तिच्या शक्तीचा प्रभाव नियमित करण्यासाठी शास्त्राचे नियम असा क्रम साहजिक दिसतो.
शिल्पकार शास्त्रीय नियमाने छिनीचे टोले मारून दगडातून देवीची प्रेक्षणीय मूर्ती निर्माण करतो, या नियमाने वाग्शक्तीलाही नियमांचे काही ठरावीक बंधन घालून, मानवतेच्या कल्याणाकडे तिचा उपयोग करण्यासाठी वक्तृत्वशास्त्राचा अभ्यास आवश्यक आहे. वाग्शक्ती जशी वाग्भूषण होते, तशी वाग्दूषणही होऊ शकते. अडॉल्फ हिटलरने म्हटले आहे, "युगान्तर घडविणाऱ्या क्रांतिकारक घटना लिहिलेल्या शब्दांपेक्षा तोंडून निघालेल्या शब्दांनीच घडवून आणलेल्या आहेत."
प्रसिद्ध जर्मन कवी आणि तत्त्ववेत्ता गटे म्हणतो, "कोणतीही कला पूर्णत्वाला पोहोचण्यापूर्वी, ती साध्य करून घेण्यासाठी प्रथम पायाशुद्ध आणि पद्धतशीर अभ्यास बराच नि विनचूक झाला पाहिजे." वक्तृत्वकलेलाही हा नियम लागू पडतो. जिला आपण प्रासादिक, सहजस्मृत नि जातिवंत कला म्हणतो, तिची उभारणी शास्त्रीय अभ्यासावरच झालेली असते. व्याख्यानात आवाजाचा उपयोग निरनिराळ्या प्रसंगी कसा करावा, निरनिराळे विकार सहजगत्या चेहऱ्यावर कसे उमटवावे, मनोविकाराचे अनेकरंगी भाव व्यक्त करण्यासाठी भाषाशैलीची आणि शब्दोच्चारांची ठेवण कशी ठेवावी, इत्यादी वक्तृत्वाच्या अनेक अंगोपांगांमध्ये बिनचूकपणा, लवचीकपणा नि साहजिकपणा कमावण्यासाठी, त्या कलेच्या शास्त्रीय म्हणजे अनुभविक नियमांचा नि सिद्धांतांचा निर्धाराने कळकळीने आणि उत्साहाने अभ्यासच केला पाहिजे.
कलेशी तादात्म्यता म्हणजेच प्राविण्य
कलेत मनुष्य प्रवीण झाला, पक्का पटाईत झाला, असे केव्हा समजावे? जेव्हा त्या कलेशी तो तद्रूप होऊन ती कलाही त्याच्यात एकजीव करताना विलीन होते, तेव्हा. मृदंगवादनाचीच कला घ्या. नवशिक्या जेव्हा मृदंगवादनाचे शास्त्र शिकू लागतो, तेव्हा-
धाता धिंत्ता किटधा धिन्ता किटतक गदिगन धा
हे बोल उमटविण्यासाठी फार परिश्रम घेत असतो. अगदी तांत्रिक कवायत असते ती. नुसते बोल उमटवूनच त्याचे भागत नाही. गवयाच्या गाण्यातील लय कशी आहे, `काल` कोठे येतो, `सम` कोठे येईल, इत्यादी अनेक अवधानांची नि भानगडींची गमके त्याला नीट अंगवळणी पाडून घ्यावी लागतात. ह्याशिवाय मृदंग्याला चकविण्यासाठी-नव्हे, चुकविण्यासाठीच-गवईबुवा मधून मधून भलतीच हूल दाखवतात. तेढ्या वळणाने गातात. त्याचेही अवधान त्याला राखावे लागते. मोठे कटकटीचे आणि कंटाळवाणे काम असते ते. पण कला साध्य करायची, तर स्वाध्यायाच्या ह्या प्राथमिक कवायत-कर्मापासून सुटकाच नसते. सुरुवातीला `काला`च्या ठिकाणी `सम` आणि `समे`च्या जागी `काल` दाखवून फसला जातो. पण तोच मृदंगवादनाचा अभ्यास शास्त्रोक्त कसोटीने करून विद्यार्थी त्यात पटाईत होतो.
मृदंगाचे शेकडे बोल तोंडाने बोलून मृदंगावर स्पष्ट उमटवू लागतो. लय, ठेका, काल, सम, तुकडे, गजरे इत्यादी सर्व प्रकार त्याच्या `हातचा मळ` होतात आणि अनेक `सोधे तेढे` गवयांची साथ करून ती कला त्याच्यात मुरते नि तो त्या कलेशी तद्रूप होतो, तेव्हा त्याची अवस्था कशी असते? प्रारंभाला बिकट वाटणारे आणि खरोखरच बिकट असणारे मृदंगवादन शास्त्र त्याला आता काहीच वाटत नाही. मृदंग्या आणि मृदंगशास्त्र आता एकजीव झालेले असतात. शास्त्री आणि शास्त्र ह्यांची जी ही तादात्म्यता, तिलाच आपण जातिवंतपणा असे नाव देतो. पण त्याच्या मागे पद्धतशीर अभ्यासाची तपश्चर्या असते, शास्त्रीय सिद्धांताची बैठक असते, हे विसरता कामा नये.
वक्तृत्वकलेचा पायाशुद्ध अभ्यास करणारा विद्यार्थी जसजसा त्या शास्त्रात प्रवीण होत जातो, तसतसे नियम, व्याख्या नि धडे यावरील त्याचे भान उडून जाते आणि व्यक्त करायच्या विकार, विचार नि उच्चार यांच्याशी तो एकतान, एकरूप होतो. शास्त्रीय बंधन जाऊन कलाविकासात तो आरपार रंगतो.
असाध्य ते साध्य करिता सायास
उपजत कवि आणि वक्ता, हा एक नुसता गौरवाच्या भाषेचा प्रकार आहे. काव्य आणि वक्तृत्व ह्या विषयाच्या आवडीचा अंकुर कित्येकात स्वाभाविक असला, तरी ज्यांच्यात तो नसेल, त्यांना अभ्यासाने कोणतीही कला साध्य करता येत नाही, असा मात्र नियम नाही. उपजत कलेच्या अभावाने धीर खचण्याचे कारण नाही. एक गोष्ट सांगतो. पुण्याला श्रीधर विठ्ठल दाते नावाचे एक अत्यंत बुद्धिमान परंतु महाविक्षिप्त गृहस्थ होते. गायनाच्या मैफलीला एकदा गेले असताना, गवईबुवांची नि त्यांची काही बोलचाल झाली. झाले, दात्यांनी पैज मारली. सहा महिन्यांत तंबोरा घेऊन तुमच्याशी गायनाच्या सामन्याला बसतो.
स्नेही सोबती हसू लागले. दात्यांचा आवाज जाडाभरडा, पल्लेदार नि भसाडा. हा कसला गवई होणार? पण दाते मात्र ठासून म्हणाले, "नावाचा श्रीधरपंत दाते आहे मी. म्हणेन ते करून दाखवीन." दुसऱ्या दिवसापासून दात्यांच्या दिवाणखान्यात तंबोऱ्याचे झणत्कार ऐकू येऊ लागले. एक नामांकित गवई त्यांनी शिकवणीला ठेवला. रात्रंदिवस गाण्याच्या शास्त्रोक्त तालमी चालल्या आणि खरोखरच सहा-सात महिन्यांच्या अखेरीसच श्रीधरपंत दात्यांनी आपल्या दिवाणखान्यात आपल्या शास्त्रोक्त (क्लासिकल) गायनाचा जलसा करून श्रोत्यांकडून वाहवा मिळवली. यावरून दाते जरी अगदी पट्टीचे गवई बनले नाहीत, उतार वय होईपर्यंत ज्याला गायनातील सारेगमचा वास कधी चुकून लागला नाही, त्यांनी श्रमांची पराकाष्ठा करून, खासगी बैठकीपुरते शास्त्रोक्त गायनाचे ज्ञान कण्ठगत केले, ही काय सामान्य गोष्ट झाली?
लोकशाहीवादी ग्रीस देशात इ. स. पूर्वी ३८३ वर्षी जन्मलेल्या आणि वक्तृत्त्वाच्या जोरावर तेथील अग्रगण्य लोकनेता बनलेल्या डिमॉस्थेनीस ह्या अजरामर वाग्भटाची माहिती लक्षात ठेवण्यासारखी असल्यामुळे, ती येथे मुद्दाम देत आहे.
"हा महाविख्यात वक्ता अथेन्स शहरी जन्मला. तो पुढे जरी महान योग्यतेस चढला, तरी त्याचे अंगचे वक्तृत्व प्रथमतः कच्चेच होते. ते असे की आवाज कोता, उच्चार साफ नाही आणि अंगविक्षेष श्रोत्यांचे चित्त वेधून टाकणारे नव्हते. यास्तव हा जेव्हा एके प्रसंगी सभेत पहिल्यांदाच बोलावयास उभा राहिला, तेव्हा सर्वांनी वरील दोषांमुळे त्याची हुर्रेवडी उडवली. पण त्यामुळे हा खचून न जाता त्याने आपल्या अंगचे वरील दोष काढून टाकण्याविषयी सतत उद्योग चालवला. तो असा त्याचा आवाज कोता होता, यास्तव तो मोठा व गंभीर करण्याकरिता त्याने समुद्रतीरी एकांती जावे आणि समुद्राच्या प्रचंड लाटा उसळू लागून त्यांची मोठी गर्जना होत असता तेथे खूप मोठ्याने आपली भाषणे म्हणावी. तसेच डोंगराच्या दरडीवरून खाली-वर पळत जाण्याची सवय करून त्यास दम छाटत नसे, तो छाटेसा केला आणि उच्चार साफ होत नसे यास्तव तोंडात बारीक गारगोट्या धरून त्याने आपला शब्द बाहेर उमटेसा केला. याप्रमाणे वाणीचे जेवढे दोष होते, तेवढे काढून टाकल्यानंतर डिमॉस्थेनीसने तिचे मोहकत्व वाढविणारे जे कित्येक गुण ते आपल्या ठायी आणण्याचा यत्न चालविला.
अथेन्स येथे रंगभूमीवर नाटक प्रयोग होत असत. यास्तव त्या कलेत अत्यंत प्रवीण असणाऱ्या काही नटांपाशी तो अंगविक्षेपादिक शिकला. तसेच आपल्या भाषणाची रचना प्रौढ, रसभरित व मनोवेधक अशी आपणास करता यावी, या उद्देशाने नामांकित इतिहासकार जो थुसिडिडीज यांचा ग्रंथ त्याने आठदा आपल्या हाताने लिहून काढला. याप्रमाणे एवढे अचाट श्रम कित्येक वर्षेपर्यंत जेव्हा डिमॉस्थेनीस याने केले, तेव्हा त्याच्या देशबांधवांत त्याचे तेज पडून सर्वांवर त्याचा पगडा बसला आणि देशहिताची मोठमोठी कामे, जी त्याने केली, ती त्याचे हातून घडली."
(निबंधमाला, वक्तृत्व, पान २४७-४८)
सारांश, नामांकित वक्त्यांचा परिणामकारक नि बहारदार वाग्विलास पाहून व ऐकून, `आपल्याला हे कसे जमणार बुवा? तेथे पाहिजे जातीचे` असल्या निराश भावनेच्या पचनी हकनाहक पडणारांनी अभ्यासाने जे अशक्य ते शक्य होत असते, हा सिद्धांत डोळ्यापुढे ठेवूनच वक्तृत्वाच्या अभ्यासाला लागावे.
वक्तृत्वाला अनुकूल काळ आला आहे
वक्तृत्वाचा जागतिक इतिहास पाहिला, तर ज्या ज्या राष्ट्रात लोकशाही प्रस्थापित झाली, तेथे तेथे वक्तृत्वाला खरा जोमदार बहर आला. लोकशाहीतच वक्तृत्वकलेचा उत्कृष्ट उत्कर्ष होत असतो. आज आपल्या येथे वक्तृत्वाच्या पाठशाळा नसल्या तरी जसजसा लोकशाहीचा उत्कर्ष होत जाईल, तसतशा त्याही जागोजाग निर्माण होतील. खरे म्हटले तर गायन कलेप्रमाणे वक्तृत्वाचे सर्वांगीण धडे गुरूसंनिधच मिळाले तर बरे. तथापि कलेचे शास्त्र म्हणून ह्या पुस्तकाच्या महत्त्वाकांक्षी उमेदवारांना पूर्वी (सन १९१८) पुष्कळ उपयोग झाला आणि चालू लोकशाही जमान्यात तर होईलच होईल, असा मला विश्वास वाटतो.
प्रकरण २
आवाजाचे आरोग्य आणि महत्त्व
श्रोतृन्मूक्यति ब्रुवन्स्थिरतमं कुर्वन्नमीषां मनो
निर्बाष्पः परबाष्पकृत्परदृशामेकाश्रयो नान्यदृक्
यस्त्थक्तांगाविकम्पनः प्रचलयन्नित्यं सतां मस्तकं
क्षीर श्रोतृषु मुख्यमात्मनि गुणंधते स वक्तोत्तमः
Two voices are there, one is of the sea,
One of the mountains, each a mighty Voice,
In both from age to age thou didst rejoice,
they were thy chosen music, Liberty?
-Wordsworth,
Poems to National Independence.
आवाज हे वक्तृत्वाचे मुख्यांग. माणसाच्या नुसत्या बोलण्याच्या आवाजावरून त्याच्या अंतर्बाह्य संस्कृतीचा तेव्हाच बोध होतो. भरघोस कणखर, पण गोड आवाजावरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा चटकन पडताळा पटतो. वक्त्याच्या तोंडून नुसता पहिला स्वर निघताच तो विद्वान, व्यासंगी, निश्चयी, सत्यप्रेमी, कळकळीचा आहे की हळवा, कमजोर नि मिंधा आहे, ह्याची श्रोत्यांना पारख करता येते. मनुष्याच्या अंतःकरणातील गूढ विकाराचे आविष्करण त्याच्या स्वरांच्या रोखठोक अथवा कंपित लहरींवरून होत असल्यामुळे, शीलाने तो कच्चा का पक्का, त्याच्या स्वभावातील बरेवाईट गुणधर्म कोणते, त्याच्या भाषणात निस्पृहता आहे का दंभ आहे, तो ज्या विषयावर बोलणार, त्याबद्दल त्याचा आत्मविश्वास भरपूर आहे का कोता आहे, वगैरे अनेक गोष्टींचा साक्षात्कार श्रोत्यांना तेव्हाच होतो.
आवाजाचे महत्त्व
भाषणाला काय किंवा व्याख्यान, प्रवचन, कीर्तनाला काय, निकोप आवाज मोठे आवश्यक भांडवल आहे. घोगरे, किरटे, चिरफाळलेले किंवा कोकिळकंठी बायकी आवाजाचे वक्ते पट्टीचे पंडित असले तरी श्रोत्यांवर त्यांना आपली छाप पाडता येत नाही. चारचौघात बसून गप्पाष्टकी संभाषण करतानाही, उत्तम, गहिरा नि मोहक आवाजाचा चतुरस्त्र आसामी बाकीच्या मंडळींवर तेव्हाच इतकी आपली छाप पाडतो की, थोड्याच वेळात तो एकटा वक्ता आणि बाकीचे सारे उत्सुक श्रोते, असा बनाव बनतो.
आवाजालाही व्यायाम हवाच
व्यायामाने आणि नियमित आहार-विहाराने शरीरप्रकृती आणि काव्यशास्त्रविनोदप्रचुर ग्रंथांच्या व्यासंगाने मानसिक प्रकृती उत्तम राखण्याची आपण काळजी घेतो. शरीर नि मनाइतकाच आपला आवाजही निकोप आणि निरोगी राखण्याची जरूरी आहे, हे फार थोड्यांच्या लक्षात येते. आवाजाचे आरोग्य वाढविण्यासाठी नि टिकविण्यासाठी गवई लोक जी मेहनत घेतात, तिचा त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य समाधानात राखण्याच्या कामीही फार उपयोग होतो.
सकाळ, संध्याकाळ २-२ तास तंबोऱ्यावर सुरावटीची मेहनत (रियाज) करणारांचे आवाज नि आरोग्य उत्तम राहतात. उत्तम आकर्षक गायनासाठी सकस, निकोप आणि झारदार गळ्याची जेवढी आवश्यकता तेवढीच ती भाषिक वक्त्यांनाही असावी लागते. वक्त्यांच्या पांडित्यापेक्षा त्याच्या भरघोस, मोहक आवाजाच्या मोहिनीचाच श्रोत्यांवर परिणाम होत असतो.
पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर हे जसे उच्च श्रेणीचे गायनाचार्य होते, तसे पट्टीचे वक्तेही होते. त्यांचे शास्त्रोक्त गायन ऐकताना श्रोते नादब्रह्याने जसे मंत्रमुग्ध होत असत, तसेच त्यांचे व्याख्यान प्रवचन चालले असतानाही तल्लीनतेने माना डोलवीत ध्वनिदंग होत असत. कै. नामदार डॉ. मुकुंदराव जयकर ह्यांचा आवाज त्यांच्या उतारवयातही खणखणीत झारदार होता. तरुणपणापासून त्यांना संगीताचा नाद होता. स्वतः तें दिलरुबाही छान वाजवीत असत.
महाराष्ट्रमहर्षी धोंडोपंत कर्वे. त्यांनी तर शंभरी ओलांडली. पण त्यांच्या आवाजातला गोंडसपणा नि गोडवा जणू काय अगदी बाल आवाजाचाच वाटत असे. कशाचा हा परिणाम? शारीरिक व मानसिक आरोग्याप्रमाणे ह्या थोर पुरुषांनी आवाजाच्या आरोग्यालाही तितक्याच काळजीने जोपासले. जीवन म्हणजे संगीत, हे कितीही खरे असले, तरी जीवनात सर्वत्र संगीत ओतून जगणारे फार थोडे. संगीताच्या अभ्यासाने मनुष्याच्या फुप्फुसांना चांगला व्यायाम मिळतो. हा एक प्रकारचा प्राणायाम विधीच आहे म्हणा ना. तंबोऱ्यावर नेहमी सूर लावून खर्जाची तालीम करणाऱ्यांच्या छातीचे विकार नाहीसे होतात.
सप्त स्वरांचे माहात्म्य
`सा रे ग म प ध नी` या सप्तसुरांचे महत्त्व केवळ गायनशास्त्रापुरतेच मर्यादित नाही. आपल्या कंठातून निघाणाऱ्या आवाजातही हेच सप्त सूर असतात. उच्चारला जाणारा कोणताही स्वर या सप्तस्वरांपेक्षा निराळा असूच शकत नाही. ही गायनशास्त्राची व्याख्या वक्तृत्वशास्त्रालाही लागू आहे. सहजगत्या होणाऱ्या संभाषणावरून एखाद्याचा आवाज कोणत्या पट्टीतला (सप्तकातला) आहे, कोणत्या पट्टीपर्यंत चढू शकेल, गायकीच्या लायक आहे किंवा नाही, चालू रेडिओच्या भाषेत सांगायचे तर, मायक्रोफोनला फिट् आहे का नाही, यापुढे तो फुटणार आहे का फुटला आहे, फुटल्यास सुधारेल का नाही, इत्यादी गमके कित्येक अनुभवी संगीतपटू तंतोतंत पटवून देतात.
स्वरांची सप्तके तीन, मंद्र, मध्य आणि तार. मंद्र म्हणजे नेहमीच्या आवाजापेक्षा कमी टिपेचा. मध्य म्हणजे नेहमीचा आणि तार म्हणजे नेहमीच्या आवाजापेक्षा उंच टिपेचा. मंद्र सप्तकाचा आवाज फुप्फुसांतून निघतो. मध्य सप्तकाचा आवाज कंठातून आणि तार सप्तकाचा आवाज तालूतून काढावा लागतो. प्रत्येकाच्या आवाजाची टीप किंवा पट्टी निरनिराळी असली, तरी बोलताना किंवा गाताना त्या त्या पट्टीच्या सारेगमपधनी स्वरांचाच भरणा त्यात असतो.
गवयी गायला बसला म्हणजे साथीदार प्रथम त्याच्या आवाजाच्या पट्टीची चौकशी करतात. (हार्मोनियमच्या भाषेत बोलायचे तर) कोणी काळी दोनमध्ये गातो, कोणी पांढरी चारमध्ये तर तिसरा काळी पाच टिपेचा असतो. ज्याची जशी टीप असेल तसे तंबोरावाला, व्हायोलिन, सारंगीवाला आणि तबलजी आपापली हत्यारे `लावून` घेतात आणि सगळ्यांची `सुरावट एकतान जमली` म्हणजे जलशाला प्रारंभ होतो. प्राचीन ऋषींनी हे सप्त स्वर कित्येक प्राण्यांच्या आवाजावरून संशोधनपूर्वक निश्चित करून त्यांना शास्त्रीय नावे दिली ती अशी-
सा रे ग म प ध नी
मोर बैल बोकड क्रौच कोकिळा घोडा हत्ती
षड्ज ऋषभ गंधार मध्यम पंचम धैवत निषाद
आरोह-अवरोह
`सा`पासून चढ्या टिपेने `नी`पर्यंत क्रमाक्रमाने स्वर म्हणण्याच्या क्रियेला `आरोह` म्हणतात आणि `नी`पासून उलट उतरत्या टिपेने `सा`पर्यंत स्वर म्हणण्याच्या क्रियेला `अवरोह` म्हणतात. या आरोह, अवरोहातही स्वरांचे आणखी कितीतरी पोटभेद आहेत. नुसते सारिगमपधनिसा सानिधपमगरिसा करून भागत नाही. त्यातही कोमल, कोमलतर, कोमलतम, तीव्र, तीव्रतर, तीव्रतम इत्यादी अनेक खाचाखोचा नि भेद आहेत. मानवी मुखांतून बाहेर पडणाऱ्या आवाजात भिन्न भिन्न असे २००० कंप आहेत, असा डेलसार्ट या संगीतज्ञाचा सिद्धांत आहे.
या नानारंगी स्वरज्ञानात जो पटाईत असतो, तो दिलरुबा किंवा सारंगीसारख्या तंतूवाद्यावरही गद्य भाषणाचे स्वर उमटू शकतो, असे म्हणतात. मानवी कंठात इतके विविध प्रकारचे स्वर निघू शकतात की, ते यथातथ्य उमटवण्याच्या कामी सतार, सारंगी किंवा दिलरुबी ही तंतूवाद्ये जशी उपयोगी पडतात, तशी हार्मोनियम पेटी पडत नाही. पंडित विष्णू दिगंबरजींनी एकदा तर स्पष्ट म्हटले की, "भारतीय गायनाची यथातथ्य साथ करण्याच्या कामी हार्मोनियम पेट्या मुळीच लायक नाहीत. कारण त्यात कित्येक स्वरच नाहीत." डॉ. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी याच मताला दुजोरा दिला होता. (बॉम्बे क्रॉनिकल, नोव्हेंबर १९१५) ऑल इंडिया रेडिओवर हार्मोनियमला बहिष्कार आहे, तो ह्याच कारणामुळे असावा.
आवाजाचे आरोग्य कसे कमवावे?
सगळ्यांनाच उत्तम आवाजाची देणगी लाभलेली असते, असे नाही. सगळ्याच गोष्टी ईश्वरदत्त किंवा जन्मजात मानल्या, तर व्यवहारात प्रयत्नवादाला किंमतच उरणार नाही. शारीरिक बळ कमावण्यासाठी जशी तालीमच करावी लागते, ठरावीक आणि नियमित व्यायाम घ्यावा लागतो, नेमका तोच प्रकार आवाजाच्या कमावणीसाठी करावा लागतो. उत्तम आवाज कमावण्यासाठी वक्तृत्वाच्या हौशी नि महत्त्वाकांक्षी उमेदवारांनी एखाद्या गवयाचे मार्गदर्शन पत्करल्यास फार चांगले.
रोज तास अर्धा तास तंबोऱ्यावर अगर पेटीच्या स्वरावर खर्ज लावण्याच्या कसरतीने किरटे, घोगरे, कमताकद आवाज सुधारल्याची उदाहरणे आहेत. ह्या खर्जाच्या नियमित तालमीने कंठ, टाळू निकोप राहतात. एवढेच नव्हे तर छातीचाही दमछाकपणा वाढीला लागून, आवाजाचा विस्तार (व्हॉल्यूम) हवा तसा लहान-मोठा करण्याची हिकमत अंगवळणी पडते.
आवाजाचा विस्तार म्हणजे नुसते मोठ्याने ओरडणे नव्हे. त्या विस्तारालाही कणखर गोडवा असला पाहिजे. पद्धतशीर तालमीशिवाय केलेल्या आवाजाच्या विस्तारात खरखर, चिरफाळ्या किंवा किंचाळ्या येऊ शकतात. त्या टाळल्या पाहिजेत. दहा फुटांवरील माणसाशी आपण बोलत असताना आवाजाचा जो विस्तार असतो, तो १०० किंवा १००० माणसांच्याचा समुदायाला ऐकू जाईल इतका प्रमाणबद्धच वाढवला पाहिजे. म्हणजे, समजा, अर्धा कार्ड आकाराचा फोटोग्राफ १२``×१५" प्रमाणात वाढवला म्हणजे चित्रातला तपशील (डिटेल्स) जसा प्रमाणबद्ध वाढतो, नेमका तोच प्रकार आवाजाच्या बाबतीत असला पाहिजे. आपला आवाज सामान्यत: कोणत्या पट्टीतला आहे हे निश्चित झाल्यावर, अनुभवी वक्ते व्याख्यानाला जाण्यापूर्वी, आवाजाची अखेरची टीप आज कोठवर नेऊ शकते, याचा अंदाज घेऊनच व्यासपीठावर चढतात.
आवाजाशी धिंगामस्ती नको
आवाजाचा उपयोग करताना त्यावर कसल्याही प्रकारचा शारीरिक अथवा मानसिक दाब नसावा. तो अगदी मोकळा दिलखुलास असावा. चोरटा नसावा. गवयात नेहमी दोन भेद आढळतात. एक, केवळ कंठातून सूर काढून गाणारा आणि दोन, चांगले अनुभवी गवई स्वरांच्या उद्गम-बेंबीपासून (अॅबडोमेनल मसल्समधून) आवाज काढून गाणारे, खरी पद्धत हीच. वक्त्यांनीही हेच केले पाहिजे. नरड्यातून आवाज काढणाऱ्याला मोकळेपणा साधत नाही आणि आवाजाचा विस्तारही करता येत नाही. विस्तारात सप्तसुरांचे भेद, विचार, विकार यांच्या प्रदर्शनानुसार स्पष्ट व्हावे लागतात. भाषणाच्या स्वरविलासात एकतानता (हार्मनी) असावी. पण एकतानता म्हणजे एकसुरेपणा नव्हे. एकसुरे वक्ते तात्काळ श्रोत्यांच्या मर्जीतून उतरतात.
भाषणाची सुरुवात अगदी मंद, साहजिक आणि तोलदार आवाजात केली म्हणजे विचारशक्ती आपल्या ताब्यात राहते. श्रोत्यांनाही ते विचार जसजसे व्यक्त होत जातील, तसे मोजून मापून ग्रहण करता येतात. उच्चार स्वच्छ, स्पष्ट आणि ठाशीव असले म्हणजे शब्दांचा नाद निनाद श्रोत्यांच्या मनावर छान परिणाम घडवित असतो.
धाकटा विल्यम पिट् याचा क्षुल्लक सुस्कारासुद्धा ब्रिटिश लोकसभेच्या भव्य सभागृहाच्या कानाकोपऱ्यात ऐकू येत असे. या जवानाने आपला आवाज इतका पद्धतशीर कमावला होता की, त्याच्या केवळ २१ व्या वर्षी त्या आवाजानेच उभ्या ब्रिटिश साम्राज्याला आपल्या धाकात ठेवले होते.
वेब्स्टरचा आवाज तर इतका भरघोस नि भिंगरीदार असे, की सभा आटोपून घरी गेलेल्या श्रोत्यांच्या कानात कित्येक दिवस तो सारखा घुमत असे. एके प्रसंगी सुभाषितातले वाक्य वेबस्टरने इतके ठासून आवेशाने उच्चारले की त्याच्या समोरचे श्रोते आपापल्या खुर्च्यातून ताडकन् उठून उभे राहिले.
मायक्रोफोनचा दुरूपयोग
जुन्या जमान्यात ५-५ नि १०-१० हजार लोकांच्या सभेत बोलणाऱ्यांना आवाजाची फेक चढी ठेवूनच भाषणे करावी लागत असत. त्या चढ्या आवाजच्या बैठकीवरून सुद्धा, आवाजाचे आरोह, अवरोह, वाक-वळणे, ठाकठीक वठवून, तत्कालीन बाबू सुरेन्द्रनाथ बॅनर्जी, डॉ. अॅनी बेझण्टबाई, नाम. गोखले, शिवरामपंत परांजपे, मुजफ्फरपूरचे हंसस्वरूप स्वामी प्रभृती मंडळी हा हा म्हणता श्रोत्यांची हृदये काबीज करून, त्यांना आपल्या विचारांनी भारून टाकीत असत. आजकालच्या वक्त्यांपुढे मायक्रोफोन नसला की त्यांची त्रेधातिरपीट उडते. याचे कारण, बहुतेकांचे आवाज शास्त्रशुद्ध कमावलेले नसतात.
आजकल मायक्रोफोनची सोय असल्यामुळे वक्त्यांची भाषणे हव्या तितक्या दूरवर जशीच्या तशी ऐकू जातात. पण मायक्रोफोनवर बोलताना, आवाजाची गति स्थिती कशी नि किती ठेवावी, हे शेकडो वक्त्यांना कळत नाही. पुष्कळजण मायक्रोफोनजवळ आपले तोंड अगदी भिडवून मोठमोठ्याने ठणाणा करीत असतात. त्यामुळे आवाजाचा प्रतिध्वनी निघतो आणि कोणाला नीट काहीच ऐकू येत नाही. वास्तविक मायक्रोफोन आहे कशासाठी? आपण सहज त्या आवाजाच्या टिपेने बोलू, ते मायक्रोफोनने जशाच्या तसे हवे तितके दूरवर सहज ऐकू जाते. पण हातात माईकचा दांडा घट्ट धरून ठणाणा करणारांना ही साधी गोष्टही समजू नये, हा बुद्धीमांद्याचा एक प्रकार होय.
टेलिफोनवरही असे ठणाणा करून बोलणारे असतात. काही मोठे लोक माईकचा दांडा हातात धरतात नि जवळ तोंड नेऊन ओरडतात, म्हणून आपणही तसे करावे, ही त्या मोठे लोकांइतकीच चूक आहे. माईकवर खूप मोठ्या आवाजाने बोलणे, ही आवाजाची `वारेमाप उधळपट्टीच` होय. ती जरूर टाळावी.
त्या अर्धचंद्राला अर्धचंद्र द्या
माईकच्या दांड्यावरील यंत्राच्या जवळच, माईक व्यापाऱ्याच्या नावाची जाहिरात करणारी एक अर्धचंद्राकृती पोलादी पट्टी बसवलेली असते. माईकमधून वक्ता बोलू लागला की ती त्याच्या थेट तोंडासमोर येते आणि श्रोत्यांना वक्त्याचे तोंड बिलकूल दिसत नाही. श्रोता-वक्ता परस्पर `सन्मुख` असले पाहिजेत. वक्त्याच्या चेहऱ्यावरील विकाराभिनय स्पष्ट दिसले पाहिजेत. ते ह्या पट्टीच्या अडथळ्याने दिसत नाहीत. हा प्रकार टाळला पाहिजे आणि सभेच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यापाऱ्याला बजावून ती पट्टी काढून टाकायला सांगितले पाहिजे.
एका गायनाच्या बैठकीत तर ह्या अर्धचंद्राचा भलताच परिणाम दिसून आला. गायिकेच्या समोर पट्टीवाला माईक ठेवला होता. माईकच्या मागे असलेल्या फूटलाईटचा प्रकाश गायिकेच्या तोंडावर पडावा, अशी योजना होती. पण मध्येच त्या पट्टीची काळीकुट्ट पडछाया तिच्या नेमकी तोंडावर पडून लांबून पाहणाऱ्याला बाईला भरघोस मिशा असल्याचा स्पष्ट भास होत होता. ती सुरूप बाई हकनाहक कुरूप दिसत होती. म्हणून ह्या पुढे त्या अर्धचंद्र पट्टीलाच अर्धचंद्र देण्याची कसोशी सर्वत्र राखली पाहिजे.
प्रकरण ३
आरोह-अवरोहांचा विचार
व्याख्यानात आपल्याला आपले विचार, विकार आणि भावना शब्दांनी व्यक्त करायच्या असतात. शब्दांना सूर अथवा स्वर असतात. स्वरांच्या आरोहावरोहांनी म्हणजे आवाजाच्या लवचिक चढणी उतरणींनी त्या भावना नि विकार शब्दांच्याद्वारे प्रकट करावे लागतात. यासाठी स्वरज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना असणे जरूर आहे. गद्य बोलताना काय, वाचताना काय, किंवा पद्य गाताना काय आपण ठराविक सात सुरांचा आणि त्यांच्या पोटभेदांचाच उपयोग करीत असतो.
साध्या बोलण्यातही संगीत असते. झारदार भिंगरीदार आवाजाच्या सुंदर चढणी उतरणीने, म्हणजेच आरोह-अवरोहांनी, सहज बोलणाऱ्याच्या आवाजाचा गोडवा श्रोत्यांना तेव्हाच आपलासा करतो.
बोलण्याच्या त्या गद्यातही एक प्रकारची संगीताची खुमारी असते. एका सुरात बोलणे खरे म्हटले तर अनैसर्गिक आहे. तरीही एकसुऱ्या आवाजात भाषणे करून श्रोत्यांच्या कानांना शिक्षा देणारे रटाळ वक्ते नसतातच असे नाही.
आरोहावरोहांचा उगम भावनांतून होत असतो. भाषणात खरे महात्म्य भावनेला आहे. स्वरांच्या खोचा, वाक आणि आरोहावरोह, निरनिराळ्या गोष्टीतील, विचारातील किंवा तत्त्वातील भेद दर्शवितात. स्वरांचा वाक जर लांबट असेल, तर तो सत्य वचनांचे महत्त्व सुचवतो. सरळ थेट असेल तर कार्याशी प्रत्यक्षता सिद्ध करतो. सौदर्य किंवा सहानुभूती दर्शविण्याच्या वेळी या वांकांत लहरी उत्पन्न होतात. हेच वाक तुटक तुटक उत्पन्न झाले, तर निर्बलता आणि विचारांचा अनिश्चितपण दाखवितात. नागमोडी किंवा लहरींवर लहरी अशा प्रकारचे स्वरांचे वाक व्यंगोक्ती, कुत्सितपणा द्वेष अथवा दुटप्पीपणा यांचे दर्शक होतात.
स्वरांच्या खोचा, वांक आणि आरोहावरोह यावरूनच वक्त्याच्या मनाचा कल नि त्याची प्रवृत्ती यांचा श्रोत्यांना बोध होतो. आशा प्रदर्शित करणे, एखादी गोष्ट किंवा विचार तहकूब करणे, त्याबद्दल शंका व्यक्त करणे, एखादा विशेष भेद अथवा विचार स्पष्ट उघडा करून दाखविणे, या वेळी स्वरांचा कल साहजिकच चढता असतो. ज्या वेळी एखाद्या शब्दावर अथवा वाक्यावर शब्दाऽघात करायचा असतो किंवा विचारपूर्णता दाखवायची असते, तेव्हा स्वरांचा कल पडता असतो.
अभ्यासाचा धडा
जगातील चित्रे आणि चरित्रे ही पराक्रमाची फळे आहेत. विलक्षण गुणांचे काही महत्कृत्य केल्यावाचून कोणाचे चित्र किंवा चरित्र उत्पन्न होत नाही. आधी चरित्र आणि मग चित्र, असा वास्तविक क्रम आढळतो. चरित्र चांगले असले म्हणजे त्याचे चित्र सिद्ध करण्याची इच्छा होत असते. देवादिकांचे नि माणसांचे जे पुतळे आपण पाहतो, त्या सगळ्यांचा प्रकार हाच. चित्र ही हाताची कृती आणि चरित्र ही मनाची कृती. चित्र ही मूर्तीपूजा. चित्र हे सगुण भक्तीचे साधन, तर चरित्र हे निर्गुण भक्तीचे साधन होय. जगातील चित्रे नाहीशी झाली, तर कोणाचे फारसे अडायचे नाही, पण चरित्रे नाहीशी झाली तर मात्र फार अडेल खास. म्हणजे चरित्र हे प्रधान आणि चित्र हे गौण चरित्राच्या योगाने चित्राला मोठेपण येत असते. वामन पंडितांनी म्हटलेच आहे ना, नामसुधेत की `हरिपण हरिनामे धातुमूर्तीस आले.` आपण माणसे मूर्तीस नाव ठेवल्यावर म्हणजे तिची प्राणप्रतिष्ठा केल्यावर, तिला भजू लागतो. याचा अर्थ हाच की, चित्राला मोठेपणा यायला चरित्र कारण होते. म्हणून चरित्र श्रेष्ठ.
(राजवाडे, चंपूकाव्य-प्रस्तावना)
आरोहांचा तर्कशुद्ध उपयोग
१. जोपर्यंत वाक्याचा अथवा वाक्यांगाचा अर्थ संपूर्ण झाला नसेल, अथवा मुद्दाम अपूर्ण ठेवायचा असेल, तेव्हा स्वरांचा वाक चढता ठेवावा,
आरोह
३. कोठे पुराणे होत आहेत;
२. कोठे कीर्तने होत आहेत,
१. कोठे भजने होत आहेत,
अवरोह
अशा प्रकारे सगळा महाराष्ट्र महोत्सवात दंग झाला आहे.
२. नकारार्थी असणारी वाक्ये नि वाक्यांगे स्वरांच्या चढत्या कमानीत उच्चारावी -
३. कोणाचे काही रुचायचे नाही,
२. दुसरा करतो ते खपायचे नाही,
१. स्वतः काही करायचे नाही,
अशा माणसाला म्हणावे तरी काय समजत नाही.
३. संशय किंवा अचानक योग व्यक्त करणारी वाक्ये आरोहाची असावी -
३. शोभणार नाही
२. हा न्याय
१. सध्याच्या लोकशाहीला
(संशय)
३. आले म्हणायचे
२. अखेर
१. वांध्यांत पडलेले घर
(आकस्मिक योग)
त्याच्या ताब्यात
४. ज्या वाक्यांचे स्वरूप प्रश्रार्थक असते, त्यांना `होय` किंवा `नाही` या दोनच शब्दांनी समर्पक उत्तर देता येते, त्या वाक्यात आरोहाची योजना करतात -
३. भागेल काय?
२. सुराज्याने
१. स्वराज्याची तहान
आरोहांचे भावनात्मक उपयोग
५. जेव्हा वाक्याचे स्वरूप आर्जवात्मक, विनंत्यात्मक असते, तेव्हा ते वाक्य अथपासून इतिपर्यंत चढत्या स्वरात बोलतात. आवाजाची टीप कमी-अधिक प्रमाणात उच्च असावी. तथापि ज्यावेळी उदास वृत्तीची विनंती, गंभीरपणाचे आर्जव करायचे असते, त्यावेळी स्वरांचा कल पडताच ठेवणे बरे.
अ) आर्जवात्मक (आरोह) : `मराठ्यांच्या मर्दुमकीचा प्रतापसूर्य एकदा मावळतो तो फिरून न उगवण्यासाठीच काय? शूर नरनारींचा महाराष्ट्र असाच का अंधारात पडून राहणार? बाप हो, छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव, तानाजी नि बाजी प्रभूंच्या उदात्त तेजस्वी नि पराक्रमी इतिहासाची चाड तुम्हाला जर नसेल, तर त्याची क्षिती दुसरा कोण बाळगणार?`
ब) विनंती (आरोह) : `मला मारून जर तुम्ही पेशव्यांच्या रक्ताशी नमकहराम झाला, तर बाजीराव साहेबांच्या कुळातील कोणता पुरुष तुम्हावर विश्वास ठेवील?`
क) उदास वृत्तीची विनंती (अवरोह) : `मोहने, माझ्यासारख्या दुर्दैवी, अपेशी पुरुषाच्या प्रेमात धन्य मानण्यासारखे काय आहे? माझी धनदौलत, माझा अभिमान, माझा दरारा या कांचनगडात भरलेला होता. ज्या वेळी गड कोसळला, त्या वेळीच माझ्यातील सर्व चांगल्या गुणांचा लोप झाला. माझ्या प्रेमात आनंद मानण्यासारखे आता काय उरले आहे?`
६. गंभीरपणाचे आर्जव (आरोह) : `जस्टिस रानडे आम्हाला सोडून आजच परलोकी प्रयाण करतील, अशी कल्पनाही काल संध्याकाळी कुणाला शिवली नसेल, पण... काळाची गती... विचित्र खरी. त्यांच्या विविध कार्याचा पसारा काही पूर्ण तर काही अपूर्ण असा सर्वत्र पसरलेला आहे. तो नीट आवरून, त्यांच्या सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी, बंधूहो, आता आपणावर येऊन पडली आहे.`
७. विनंती किंवा प्रार्थना करण्याच्या वाक्यांत स्वरांचा आरोह असला, तरी विकारानुरूप टिपेची पट्टी कमी-जास्त प्रमाणात असेल. हाच नियम गंभीर प्रार्थना, हृदयद्रावक आर्जव यांना लागू आहे.
८. आनंद प्रेम, भक्ती, मैत्री, आशा आणि बहुतेक सर्व आनंददायक विकार दर्शविणारी वाक्ये आरोहात असतात, पण शेवटचे शब्दोच्चार अगदी वरच्या टिपेत होतात. अत्यंत मृदुलता, दया, करूणा यांचे मिश्रण असल्यास, आरोह असला तरी स्वरांची टीप खालच्या सप्तकातील राहाते.
९. आश्चर्य, विस्मय, अद्भुत प्रकार दर्शविणारी वाक्ये उच्च स्वरांच्या टिपेत उच्चारली, तरी आदरयुक्त भीती, धास्ती नि भय-मिश्रित वाक्यांचा सूर खालच्या सप्तकातलाच लागतो.
अवरोहांचा तर्कशुद्ध उपयोग
१) एखाद्या वाक्याचा अथवा पोटवाक्याचा अर्थ संपूर्ण झाला असे तर्काने वाटताच. त्या ठिकाणी स्वरांचा कल पडताच ठेवला पाहिजे.
२) स्वरांचा अवरोह झाला म्हणजे अर्थपूर्णता झाली असे वाटते. तान मारताना गवई प्रथम आरोह करून नंतर विश्रांतीसाठी अवरोहाच्या शेवटच्या टप्यावर येतो. अवरोह हे एक विश्रांतीचे ठिकाण आहे आणि येथेच `विराम` साहजिकच घडून येतो. म्हणून मोठमोठ्या वाक्यातील अपूर्ण मतलब असलेली, पण अर्थपूर्णतेसाठी एकमेकांवर अवलंबून असलेली पोटवाक्ये उच्चारताना आणि त्यांचा परस्पर संबंध वेगवेगळा दाखवण्यासाठी, अवरोहाची योजना फार खुबीने नि चातुर्याने केली पाहिजे.
३) ज्या वाक्यांचे स्वरूप प्रश्नार्थक असते, पण त्यांना `होय` किंवा `नाही` या दोन शब्दांनी दिलेले उत्तर पुरेसे होत नाही, तर त्यासाठी स्वतंत्र वाक्याची योजना करावी लागते, तेथे स्वरांचा कल पडता असतो. जसे
प्रश्न - ही नोकरी सोडून तू जाणार तरी कुठे?
उत्तर - का? वाटेल तिथे. नोकऱ्यांचा काही दुष्काळ पडला नाही.
४) ज्या वेळी एखाद्या गंभीर प्रतिज्ञेची अगर आपल्या भाषणाच्या सत्यतेची खात्री पटवायची असेल, त्या वेळी स्वरांचा कल पडता तर पाहिजेच, पण मुख्य मुद्दयांच्या शब्दांवर आघातही केला पाहिजे. वाक्य नकारार्थी असेल तरी हरकत नाही, पण आघातमिश्रित अवरोह अपेक्षित परिणाम केल्याशिवाय राहणार नाही. ह्या ठिकाणी स्वरांची टीप सर्वसाधारण सप्तकातली असते.
५) आज्ञा, धाक किंवा अधिकार दर्शविणारी वाक्ये आघात मिश्रित अवरोहात उच्चारावी लागतात. स्वरांचे प्रमाण मध्यम सप्तकापासून तो नीच सप्तकापर्यंत असते.
आर्जवात्मक (आरोह)
`भरतखंडातील जयश्रीचा प्रतापसूर्य एकदा मावळला तो फिरून न उगवण्याकरिताच काय? आमचे प्रतापी आर्यावर्त असेच का अंधारात रहावयाचे? महाराज, यावच्चंद्रदिवाकरौ ज्यांची कीर्ती या भूतलावर अजूनही दुमदुमत आहे, त्या तुमच्या श्रीरामचंद्र, युधिष्ठिर, विक्रमादित्य, अशोक इत्यादी पूर्वजांच्या उदात्त, तेजस्वी आणि निष्कलंक सत्त्वांची तुम्हाला जर चाड नसेल तर त्यांची क्षिती दुसऱ्या कोणी बाळगावी बरे?`
- कर्नल ऑल्कॉट
विनंती (आरोह)
सुमेरसिंग, खरकसिंग, पाच पाच लाख रुपये व दोन किल्ले एवढेच जर आपल्याला पाहिजे असेल तर तसा माझ्या सहीशिक्याचा हुकूम मी आता तुम्हाला देतो. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही काकांना पेशव्यांचे गादीवर बसवा. मला जिवंत ठेवल्याबद्दल काका तुमच्यावर खात्रीने रागवणार नाहीत, उलट पेशव्यांच्या रक्ताशी तुम्ही बेईमानाने वागला नाही म्हणून मी लिहून देत असलेल्या दोन किल्ल्यांचे ऐवजी तीन किल्ले बक्षीस देतील. मला मारून तर तुम्ही पेशव्यांच्या रक्ताशी नमकहराम झाला, तर बाजीरावसाहेबांच्या कुळातील कोणता पुरुष तुम्हावर विश्वास ठेवील?
- भाऊबंदकी - अंक १-१
६) साधारण नियमच असा आहे की उग्र, कडक, तापट, खुनशी विकार (म्हणजे राग, संताप, त्वेष, द्वेष इत्यादी) प्रगट करताना स्वरावरोह अतिशय आघाताने नि झपाट्याने बाहेर पडत असतात. मात्र, स्वरोच्चार कितीही उंच असला तरी त्याची अखेरची टीप खालच्याच सप्तकात फुटते, हे लक्षात असावे.
(७) औदासिन्य, खेद, दिलगिरी इ. दुःखद विकार व्यक्त करताना स्वरोच्चारांचा कल मुख्यत्वेकरून पडता असतो. स्वर अगदी मंद्र (खालच्या) सप्तकातला असून, शिवाय प्रत्येक शब्दाच्या उच्चारात काल किंवा विराम हे फार दीर्घ असतात.
अभ्यासाचे धडे
"एकूण ज्या पुरुषाच्या पोटी संतान नाही, त्याची गती अशी होते ना! ज्याचा तो मरण पावला म्हणजे त्याची सगळी संपत्ती एखाद्या परक्याच्या हाती लागते! झाले, मी मरण पावलो म्हणजे या पुरुवंशातल्या राजलक्ष्मीचीदेखील भलत्याच ऋतूत पेरलेल्या जमिनीप्रमाणे व्यवस्था होणार!"
- शाकुंतल, अंक ६ - कै. किर्लोस्कर
"हाय हाय! कैकयी, खचित माझा प्राण घेण्याला कारण तू होणार! चांडाळणी, तू आपला हट्ट न सोडलास तर केवढा घात होणार, हे तुझ्या लक्षात तरी आहे काय? हा दुष्टा! हतदैव दशरथा! या काळसर्पिणीरूप स्त्रियेवर लुब्ध होऊन हा विशुद्ध रविवंश बुडविलास रे बुडविलास. धि:कार असो तुला!!"
- रामराज्यवियोग, अंक ३. कै. किर्लोस्कर
मार्गदर्शन आणि सूचना
सर्वसाधारण विद्यार्थ्याना नियम आणि व्याख्या कंटाळवाण्या वाटणे साहजिकच आहे. स्वरोच्चाराचे खरे मर्म भावनांच्या यथातथ्य प्रगटीकरणात असते, एवढे ध्यानात असले म्हणजे झाले. वास्तविक, हा विकार नि भावनांच्या प्रगटीकरणांचा धर्म नैसर्गिकच असतो. मात्र सर्वांना तो सारखाच व्यक्त करता येतो, असे नाही. आश्चर्य किंवा राग हा विकार घेतला, तरी प्रत्येकजण तो आपापल्या स्वभावानुसार वेगवेगळ्या तऱ्हेने व्यक्त करीत असतो.
सध्याच्या जीवनात रेडिओने अत्यंत महत्त्वाचे स्थान पटकावले आहे. रेडिओवर जशी गाणी गायली जातात, तशी भाषणे, संभाषणे, व्याख्यानेही दिली जातात. तमाशेही होतात. त्यात भाग घेणाऱ्या स्त्रीपुरुषांना स्वरांच्या आरोह-अवरोहांचा, तमाशेही होतात. त्यात भाग घेणाऱ्या स्त्रीपुरुषांना स्वरांच्या आरोह-अवरोहांचा, शब्दाऽघातांचा, स्वरांच्या वाकवळणांचा आणि विशेष म्हणजे गद्य भाषणातील सप्तसुरांचा मुद्दा विशेष अगत्याने अभ्यासणे जरूर असते. टेलिव्हिजन चालू झाले नाही तोवर हावभाव आणि मुद्राभिनयाचा प्रश्न जरी गौण असला, तरी आवाजाचे आरोग्य, कमावणी, स्वरोच्चार यावरच भाषकांना रेडिओवर आपली करामत दाखवायची असते. निरनिराळ्या भावना, विकार आणि विचार यांचा प्रभाव व्यक्त करायचा असतो.
पण काय सांगावे! रेडिओवर भाषणे करणाऱ्यांपैकी शेकडो ९५ स्त्रीपुरुषांना अजून या महत्त्वाच्या मुद्दयांची असावी तितकी जाणीव मुळीच नसल्याचे आढळते. रेडिओवर होणारी भाषणे `वाचावी` लागतात. इतकेच नव्हे तर ती प्रथम `बोलायच्या भाषाशैलीने लिहावी` लागतात आणि या एकाच मुद्याचे ज्ञान बहुतेक भाषकांना नसल्यामुळे, रेडिओवरची मोठमोठ्या विद्वानांची भाषणे अगदी भिकारडी होतात. शब्दोच्चारांतही `निरनिराळ्या` या शब्दाचा उच्चार `नीऽरनिराळा` करण्याची रेडिओ भाषकात तर शर्यतच लागलेली दिसते. या मुद्यावर `भाषाशैली` प्रकरणात आणखी सूचना दिलेल्या आहेत, तिकडे विद्यार्थ्यांनी अगत्य लक्ष्य द्यावे.
स्वगत भाषणे अभ्यास
आरोहवरोह आणि स्वरांची भिन्नभिन्न विकारांनुसार होणारी वाकणे नि वळणे, ह्यांचा अभ्यास करणारांनी काही निवडक जुन्या इंग्रजी-मराठी नाटकांतील स्वगत (सॉलिलोकी) भाषणांचा श्रवणनिरीक्षणपूर्वक अभ्यास करावा. शक्य ती ती नाटके मुद्दाम पहावी, म्हणजे पटाईत नट ती कशी वठवितात, हे प्रत्यक्ष समजून येईल. प्रथम हे नाटक नीट अभ्यासावे, निरनिराळ्या पात्रांच्या भूमिका समजावून घ्याव्या, म्हणजे स्वगत (आत्मगत) भाषण करणाऱ्या पात्रांच्या त्या त्या प्रसंगाच्या मनोविकारांच्या खळबळीचा आपल्याला प्रत्यय पटून, त्यांच्या भाषणातील भावनांचा रागरंग कळेल. भूमिका आणि प्रसंग नीट पटल्याशिवाय, निरनिराळ्या विचारांच्या हेलकाव्यांनी विचार कसे खळबळत बाहेर पडतात, शब्दोच्चारांचा चढ-उतार कसा होता आणि चित्तवृत्ती दाटून कोंदटल्यावर आवाजाची भिंगरी अगदी खालच्या खर्जात कशी रोरावते, ह्याचा अनुभव घेता येणार नाही.
वर मी जुन्या नाटकाची शिफारस केली आहे. त्याच नाटकात उत्कृष्ट आत्मगत भाषणांचे नमुने आढळतील. नव्या पालवीच्या नाटककरांना आत्मगत भाषणांचे अजीर्ण झालेले दिसते.
आत्मगत भाषण म्हणजे काय?
“आत्मगत भाषणाचा प्रसंग म्हणजे स्वतःशी एकाग्रचित्त एकांताचा अनुभव. आपण कसे व्हावे, कसे असावे, हे एकांत दाखवतो. आम्ही कसे आहोत हे समाज सांगतो. वास्तविक पाहिले तर, समाजाच्या अभिप्रायापेक्षा, आपल्या खऱ्याखुऱ्या प्रकृतिधर्माची ओळख एकांतातच होत असते. एकांतात आपल्याला निसर्गाचे प्रत्यक्ष दर्शन होते. आपसात कोणी कुजबुजले का झाला त्याचा खेळ बंद. एकांतात निसर्ग आपल्याला नवनव्या योजनांचे मनमोकळे पाठ देत असतो. येथेच त्याचे शुद्ध स्वरूप पाहता येते."
- रेवरंड रिचर्ड सैसिल. ज. १७४८, मृ. १८१०.
अभ्यासासाठी धडे
शेक्सपियरच्या `हॅम्लेट` नाटकातील त्या राजपुत्राचे स्वगत भाषण (सॉलिलोकी) वाङ्मय, शब्दयोजन त्यातून आपोआप निर्माण होणारे विचार-विकारांचे तुफान, सर्वच बाबतीत श्रेष्ठ गणले जाते. त्या नाटकाची मराठीत दोन भाषांतरे झालेली आहेत. पैकी आगरकरांचे `विकारविलसित` हेच काय ते नाटकवाल्यांना आणि लोकांना माहीत. दुसरे, आनंदराव बर्वे यांनी लिहिलेले (स्वतंत्र रचनेचे) `हिंमतबहाद्दर` हे नाटक विस्मरणाच्या पडद्याआड कधीच बेपत्ता झाले आहे. आगरकर प्रबंधकार. बर्वे नाटककार. म्हणून `विकारविलसित`पेक्षा `हिंमतबहाद्दर` नाटकातल्या पात्रांची भाषा सरळ नि सुटसुटीत आढळते. आगरकरात भाषांतरी कृत्रिमपणा विशेष आणि त्यांनी आपल्या प्रस्तावनेत कबूलही केलेले आहे. हिंमतबहाद्दरच्या स्वगताची बैठक मूळ शेक्सपियरच्याच विचारांची असली, तरी बर्वे यांनी नाट्यौघानुसार ती आपल्या भाषेत स्वतंत्र लिहिली आहे. आगरकरांच्या तर्जुम्यातील भाषेची दुर्बोधता दाखविण्यासाठी, त्या स्वगताचे मी बोलभाषेत केलेले (सरळ) रूपांतर वाचकांनी तोलून पहावे.
HAMLET`S SOLILOQUY
To be, or not to be, - that is the question:
Whether `tis nobler in the mind to suffer.
The slings and arrows of outrageous Fortune
Or to take arms against a sea of troubles,
And by opposing end them? To die - to sleep -
No more, and by a sleep, to say we end
The heart-ache, and the thousand natural shocks.
That flesh is heir to, `tis a consummation
Devoutly to be wished. To die, to-sleep -
To sleep! perchance to dream? ay, there`s the rub
For in that sleep of death what dreams may come,
When we have shuffled off this mortal coil
Must give us pause, there`s the respect
That makes calamity of so long life,
For who would bear the whips and scorn of time,
The oppressor`s wrong, the proud man`s contumely,
The pangs of despised Love, the low,s delay,
The insolence of office, and the spurns
That patient merit of the unworthy takes
When he himself might his quietus make
With a bare bodkin? who would fardels bear,
To grunt and sweat under a weary life,
But that the dread of something after death,
The undiscovered country, from whose bourn
No traveler returns, puzzles the will,
And makes us rather bear those ills we have
Than fly to others that we know not of?
Thus conscience does make cowards of us all.
And thus the native hue of resolution
Is sick lied o`er with the pale cast of thought,
And enterprise of great pith and moment,
With this regard, their currents turn away,
And lose the name of action.
आगरकरकृत वरील इंग्रजी स्वगताचे मराठी भाषण
चंद्रसेन : जगायचे की मरायचे एवढाच प्रश्न उरला आहे. कसे? दैवाच्या दारूण दुर्विलासामुळे होणाऱ्या अनंत यातना मनातल्या मनात सोसाव्या हे बरे, किंवा जिवावर उदार होऊन त्यांचा समूळ प्रतिकार करण्यास उद्युक्त व्हावे हे बरे? मरणे - निजणे - हो, दोन्ही सारखीच. यात काय अधिक आहे? आणि निजणे म्हणजे अंतःकरणाला आणि शरीराला सतत जाचणाऱ्या अनंत आधी व व्याधी यांचा क्षणभर विसर पाडणे. असे होईल तर किती इष्ट होईल? मरणे - निजणे. निजणे, पण त्यात स्वप्न पडले तर? येथे पंचायत आली खरी. कारण या नाशवंत कुडीला ती महानिद्रा घेऊ लागल्यावर काय काय स्वप्ने पडतील याचा निश्चय करता येत नसल्यामुळे साहस करण्यास धीर होत नाही. आणि म्हणूनच आम्ही आपले सगळे आयुष्य दुःखात काढतो, नाही तर निर्दय काळाचे तीव्र कोरडे कोण ओढून घेता? जुलमी लोकांचा अन्याय, किंवा गर्विष्ठ लोकांचा उद्दामपणा कोण साहता? प्रेमभंगामुळे मनास होणाऱ्या अनंत वेदना, न्याय मिळण्यास लागणारा उशीर, अधिकाऱ्यांचे उद्दाम आचरण आणि बिचाऱ्या सहनशील गुणवान लोकांना विचारशून्य अज्ञान लोकांचे जे लत्ताप्रहार घ्यावे लागतात, या सर्वांचा धारेच्या वीतभर पात्याने शेवट करिता येतो तर ते कोण सोसता? हा दुर्वह प्रपंचभार डोकीवर घेऊन हे दुःसह आयुष्य कण्हत कण्हत कोण कंठिता? पण उपाय काय? ज्याच्या सरहद्दीवर पाय टाकलेला कोणीही पांथ परत येऊ शकत नाही, अशा त्या यमलोकात एकदा प्रवेश केल्यावर पुढे काय होईल या भीतीने आमच्या बुद्धीचा निश्चय ढळतो आणि आम्ही ज्या व्यथा सोशीत असतो त्याच सोसणे बरे, पण ज्या अदृष्ट व अननुभूत आहेत, त्यात उडी घालणे नको असे वाटू लागते. याप्रमाणे विचार करण्याने आम्हा सर्वांच्या पदरी भेकडपणा येतो, बुद्धीचा निश्चय झाल्याबरोबर मनास वाटणारा जो उल्हास तो करू की नको करू असल्या विचारांनी तेव्हाच गलित होतो आणि मोठमोठ्या साहसांचा प्रचंड कल्पनांचा ओघ मागे फिरून त्या कधीच सिद्धीस न जाता जेथल्या तेथे लय पावतात.
ठाकरे कृत याच स्वगताची बालबोध नाट्यमय रचना
जगावे... का... मरावे? हाच काय तो प्रश्न... राक्षसी दैवाच्या कठोर आघातानी होणाऱ्या अनंत यातना - मनातल्या मनात सोसाव्या - का – व्हावे जिवावर उदार नि कसावी कंबर त्या तुफानी यातनांचीच मुंडी पिरगळायला? - मरण आणि झोप! - हो, दोन्ही सारखीच. काय फरक आहे त्यात? आणि - झोपणे म्हणजे - मनाला न् शरीराला सारख्या टोचणाऱ्या नि बोचणाऱ्या अनेक आधिव्याधींचा क्षणभर विसर पाडणे-हेच. -आहाहा, असे होईल तर किती छान होईल. -मरणे!
- झोपणे! पण झोपेत स्वप्ने पडली तर? -अरेरे, -तीच तर सारी पंचाईत. (ती तर भलतीच भानगड!) -ह्या नाशवंत कुडीचा त्याग करून, ती महानिद्रा घेऊ लागल्यावर - काय काय नि कसकसली स्वप्ने पडतील याचा नेम नसल्यामुळे-मरणाचे धाडस करायला-धीर होत नाही. आणि म्हणूनच-म्हणूनच-आम्ही आपले सगळे आयुष्य दुःखात काढतो. -हो, नाहीतर निर्दय काळाच्या चीडखोर वाकुल्या नि त्याचे कठोर कोरडे कोण सहन करतो? जबरदस्तांचा जुलूम-आणि घमेण्डखोर गबरूंचा उद्दामपणा कोण जुमानता? प्रेमभंगाच्या डागणीने मनाला होणाऱ्या वेदना,
-न्याय मिळायला लागणारा उशीर, -अधिकाऱ्यांचे उद्दाम वर्तन, -आणि बिचाऱ्या सहनशील गुणी लोकांना विचारशून्य टोणप्यांकडून मिळणारे हकनाहक लत्ताप्रहार-या सगळ्यांचा-धारदार सुरीच्या टीचभर पात्याने जर शेवट करता आला असता,-तर-खरोखरच कोण ते सहन करता? -कंटाळवाण्या जीविताचा डोईजड भार कण्हत कुंथत कोण कशाला वाहता? -सारे खरे. -पण उपाय काय?
-ज्याच्या सरहद्दीवर पाऊल टाकलेला कोणताही फिरस्ता परतूच शकत नाही-त्या यमलोकात प्रवेश केल्यावर-पुढे काय होणार? -या भीतीनेच आमची बुद्धी गांगरते-आणि-आम्ही ज्या व्यथा, संकटे, आघात सोशीत आहोत, ते सोसणेच बरे-पण, जे आज दिसत नाहीत-ज्यांचा कसलाच काही अनुभव नाही-त्यात उडी घालणे नको, असे वाटू लागते. -या प्रमाणे विचार-विचार सारखे विचार करण्यानेच आम्हा सर्वांच्या पदरी भेकडपणा येतो-बुद्धीचा निश्चय झाल्याबरोबर मनाला जो उल्हास वाटतो-तो-`करू का नको करू`च्या हेलकाव्यांनी तेव्हाच पांगळा पडतो-आणि-मोठमोठ्या साहसांच्या प्रचंड कल्पनांचा ओघ जागच्या जागी थिजून, त्या कल्पनासुद्धा ठिकच्या ठिकाणी गारद होतात.
***
१) कै. आनंदराव बर्वे यांनी `हिम्मतबहाद्दर` नाटकाला `हॅम्लेट`चाच पाया घेतला असता, तरी पात्रांना त्यांनी इकडचा पेहराव चढवला आणि रचनाही बहुतेक स्वतंत्र केली. `हॅम्लेट`च्या स्वगताची बडदास्त त्यांनी कशी ठेवली ती पाहणेही मनोरंजक आहे
हिम्मतबहाद्दर
काय? पुढे आता काय करावे? हे असले जिणे पत्करावे की त्याच्यावर पाणी ओतावे? मुख्य विचार तूर्त एवढ्याच गोष्टीचा आहे. प्राक्तन तर हात धुवून पाठीस लागले आहे. त्याचा उपद्रव मुकाट्याने सहन करून आल्या भोगाला सादर व्हावे हा एक मार्ग, किंवा कंबर बांधून त्याच्यावर हत्यार उपसावे आणि होणाऱ्या दुःखाचे निर्मूळ करावे, हा दुसरा मागा. ह्यापैकी कोणता मार्ग स्वीकारण्यात अधिक पुरुषार्थ? मनाचा थोरपणा विसरून कोणत्या कृतीत? जीवाची आशा धरली तर पहिल्याचा स्वीकार केला पाहिजे.
दुसरा पत्करला तर जीवावर लाथ मारली पाहिजे. तेवढे केले आणि मृत्यूरूप निद्रेच्या स्वाधीन झाले, म्हणजे मग एकंदर निश्चिती! मनाचा सर्व त्रास आणि हजारो प्रकारच्या शरीरास होणाऱ्या यातना यातून एकदाची अखेरची सुटका नाही का होणार? मग आणखी जास्त ते काय पाहिजे? तेवढे झाले म्हणजे सर्व काही मिळाले. तेव्हा मरणच बरे दिसते.
पण तसे म्हटले तरी दुसरी नाही का एक मोठीच अडचण पुढे येऊन उभी राहत? जन्ममरणाच्या फेऱ्यातून कोठे मी मुक्त झालो आहे? ध्रुवं जन्म मृत्युस्य च. असे तर साक्षात भगवद्वाक्यच आहे. हा देह ठेवला की पुन्हा जन्म नाही असे असते तर गोष्ट निराळी होती. पुनः आणखी दुसरा कोणता जन्म प्राप्त होणार - त्यात जीवाला आणखी कोणकोणत्या यातना भोगाव्या लागणार, याचा कोठे पत्ता आहे? त्याजविषयी खात्री नाही म्हणूनच तर मन कांचवते आणि मागे घेते व निश्चय कितीही दृढ केलेला असला तरी तो ढळतो.
भावी स्थितीविषयी कोणताच अजमास करता येत नसल्यामुळे मनात असे येते की जाऊ द्या, ह्या जन्मी काय काय सोसावे लागणार, ते निदान समजू तरी शकण्याजोगे आहे. ते टाळण्यासाठी जाऊ यत्न करण्यास आणि परिणामी ते लक्षपट बरे, असे म्हणविणारे भलतेच काही कपाळी येतील. तसे नसते तर राजाचा जुलूम, गर्वाने उन्माद प्राप्त झालेल्या लोकांकडून होणारा उपमर्द, आपल्या प्रेमाचे चीज न झाल्यामुळे होणाऱ्या वेदना, आपल्याहून नीच आणि अयोग्य माणसांकडून होणारा अपमान आदी करून जी सहस्रावधी दुःखे ह्या जन्मी सोसावी लागतात, ती टाळण्यासाठी उरात कट्यार खूपसून घेण्यासाठी कोण न तयार होते?
***
(बोलण्याच्या भाषेत `त्यास` | जीवास, | प्रेमास` हा द्वितीया विभक्तीचा सरकारी प्रत्यय फारसा कोणी वापरीत नाही. नाटकातील संभाषणात तर तो मुळीच नसावा. कारण तो बोलणेही जड जाते. सर्वत्र `ला`ना प्रत्यय सुटसुटीत म्हणून वापरणे उत्तम. जुन्या जमान्यातल्या नाटककारांनी या मुद्द्याकडे फारसे लक्ष दिल्याचे दिसत नाही.)
***
२) `काळ`कर्ते परांजपे कृत `भीमराव` नाटकातला एक स्वगताचा नमुना –
भीमराव : हल्लीच्या या क्षुद्र जगाचा मला अगदी वीट आला आहे. हल्ली मोठे नि उदात्त असे काही राहिलेच नाही. ग्रंथकार, मुत्सद्दी, योद्धे सगळे भिकारी - भिकार झाले आहेत. पहिल्या लोकांच्या बरोबरीला एकही उतरत नाही. जुन्या लोकांनी अच्चे केले, म्हणून निव्वळ तोंडाची वाफ दवडीत बसतात, पण त्यांच्या हाताने काहीच होत नाही. ज्यांनी लोकांच्या मनात नवीन कल्पना भरवून द्यायच्या, त्या ग्रंथकारांकडे पाहिले, तर सगळ्या उष्ट्या पत्रावळी! जुन्या एकेका ग्रंथावरच त्या मूर्खांच्या शंभर शंभर टीका. – बरे, ही बुद्धीची कामे राहिली. निदान चांगली दणकट नि सशक्त मुले तरी यांनी आपल्या देशाला पैदा करून द्यायची होती? पण तेही नाही. गुलामांच्या कंबरा ढिल्या पडल्या आहेत, आणि केवळ सुवर्णमालिनी वसंताच्या मात्रेवर प्रजोत्पादनाचे सामर्थ्य येऊन बसले आहे. निरर्थक आणि निरुपयोगी समाजबंधने निर्माण करून, यांनी प्रामाणिक लोकांना निष्कारण जखडून टाकले आहे. एकीकडे बादशहाची मर्जी सुप्रसन्न करून घेण्यासाठी, हे त्याच्या हुजऱ्याचीदेखील हाजी हाजी करतात आणि दुसरीकडे गरीब नि अनाथ लोकांवर मात्र आपला अरेरावीचा करडा अंमल गाजवितात. बाहेरून धर्माचे ढोंग दाखवितात, पण आतून गरीबांची आतडी पिळून द्रव्यरूपी रक्ताचे आपण किती थेंब साचविले, त्याच्याबद्दल विचार करीत असतात. आपण वाटेल तसे वागतात आणि दुसऱ्यांनी मात्र असे वागावे नि तसे वागावे, म्हणून कायदे करून ठेवतात. या कायद्यांचा तर मला मोठा संताप येतो. त्यांच्यापासून काय उपयोग व्हायचा आहे? ज्यांनी या विस्तीर्ण आकाशात गरुडासारख्या भराऱ्या माराव्या, त्यांना या कायद्यांनी गोगलगाय करून ठेवले आहे. कायद्यांनी अजूनपर्यंत एकतरी मोठा मनुष्य निर्माण केला आहे काय? राक्षसी शक्तीचे योद्धे आणि महापराक्रमी पुरुष हे स्वतंत्रतेमध्येच उत्पन्न होतात. पण काय करावे? तसली माणसे सध्या कोठेही आढळत नाहीत.
***
३) ठाकरे कृत `काळाचा काळ` या ऐतिहासिक गद्य नाटकातले बनबीराचे स्वगत भाषण -
भूमिका आणि प्रसंग : पन्नादाईने वाचवलेला तरुण राजपुत्र, केदारनाथ असे खोटे नाव घेऊन वेशांतराने चित्तोडला आलेला असतो. बनबीरकन्या कमलदेवी त्याला ओळखते. तिचे त्यावर प्रेम असते. राजपुत्राने बनबीराला ठार मारू नये, आणि बनवीरानेही राजपुत्राला ठार मारू नये, आणि दोघेही एकमेकांसमोर येऊ नयेत, अशी तिची धडपड चाललेली असते. राजपुत्राचा खुनी म्हणून स्वतः राजपुत्रच केदारनाथ नाव घेऊन बनबीराकडे आला होता. काही शंका आल्यामुळे बनबीर केदारनाथाला बोलावतो. कमलदेवी शक्य तो सामोपचाराने "बाबा, बाबा त्याला भेटू नका." असे विनवते.
बनबीराने सारा मेवाड जुलुमजबरदस्तीच्या घरटात दळून काढलेला असतो. अत्याचारांचा त्याने कहर उसळविला होता. एकूणएक विरोधकांची त्याने चटणी उडवली होती. असल्या मदांधाला कमलदेवीच्या इशाऱ्याने काय वाटले, याचे शब्दचित्र या आत्मगत भाषणात काढलेले आहे.
बनबीर (स्वगत) : त्या केदारनाथच्या नजरेला पुन्हा पडू नका? वरचेवर असा इशारा ही का बरं देत आहे? माझ्या सामर्थ्याच्या पासंगालाही पुरणार नाही, अशा ह्या तरुण पोरात काय असं गूढ असावं, का कमलनं त्याची जीवापाड तरफदारी करावी? त्याच्या नजरेला पुन्हा न पडण्याचा जिव्हाळ्याचा इशारा द्यावा? आणि त्या इशाऱ्यानं माझ्या खंबीर मनाचीही शांती ढासळू लागावी? आगीचे लोळ बेफाम ओकणाऱ्या तोफांच्या तोंडावर बेगुमान घोडदौड चढवून, शेकडो गोलंदाजांची कत्तल सहज लीलेने करणाऱ्या बनबीराची छाती, कमलच्या या कोमल इशाऱ्याने एकदम धडधडू लागावी? ज्याच्या नुसत्या नावाचा दरारा, दिल्लीच्या पातशाही दैवाचा झोला काबूल ते बंगाल गोता खात भडकवीत आहे, त्या बनबीराचे काळधैर्य आज कच खाऊ लागावं? मनगटाच्या जोरावर काळाचा काळ बनून शेकडो कर्दनकाळ बंडखोरांना धूळ चारणारा मी बनबीर... मग एकाकी माझ्या तेखाला ओहोटी लागल्याचा भास मला का होत आहे? - कोणते पाप- (भयंकर आरोळी मारून) पाऽऽऽप! - पापाचे पर्वत - बेलगाम सत्तेच्या प्राप्तीसाठी मी अमानुष पापांचे पर्वत रचले. सत्तामदाच्या धुंदीत हजारो जीवांचे हकनाहक बळी घेतले.
त्या पापांची पिशाच्चे-ही पहा - मसणवटीतल्या भुतांसारखी - ही पहा - माझ्या भोवती नंगा नाच घालीत आहेत - हां, खबरदार-अशी एकदम लगट करू नका-काय? तुम्ही माझ्या काळजाचे चावून चावून तुकडे करणार? -अरेरे किती अक्राळ विक्राळ ह्यांच्या दाढा ह्या! छे, नाही बघवत यांच्याकडे... पापांच्या पायावर उभारलेली सत्ता, म्हणजे वेताळ पापा, तुझ्या या भुतांच्या भुताटकीचा बिनशर्थ बळी, हीच तुझ्या उपासनेची करवंटी अखेर तू माझ्या हातात देणार काय?-
पण आता या विचारांचा उपयोग काय? पापाच्या पुरस्कारानेच पराक्रमाचा पतंग थेट अंतराळात भिरकावून, मी रंकाचा राव झालो. आता माघार? छट्. नरकात गेलो तरी आता पिछेहाटीची बात नाही. माझ्या पातकांच्या पिशाच्चांनो, पश्चातापाची सीमा ओलांडून पार झालेला हा बनवीर, दुष्कर्माच्या भुताटकीत, आता तुम्हालासुद्धा चारीमुंड्या चीत केल्याशिवाय राहणार नाही-बस्स. आता यापुढे खून, रक्तपात, अत्याचार यांचाच राक्षसी धुमाकूळ मी खेळत बसणार. पुण्यकर्माचा पुरस्कर्ता म्हणून नावलौकीक कमावण्याची संधी जरी मला मिळाली नाही, तरी माझ्या मनाच्या मसणवटीला काबीज करणाऱ्या वेताळा, दुष्कर्माचा बादशहा म्हणून माझी कीर्ती इतिहासात मी अजरामर करून ठेवणार. पुण्याचा पुरुषोत्तम म्हणवून घेण्यापेक्षा, पापांचा परमेश्वर म्हणून बखरकारांनी माझं नाव आचंद्रार्क गायलं पाहिजे-बनवीराच्या मानी मना, शोध कर-नीट कसोशीने शोध कर. सद्वासनेचा एखादा क्षुद्र तंतू तुझ्या कानाकोपऱ्यात कुठं दडून बसला असेल, तर त्याला आत्ताच्या आता जाळून टाक. म्हणजे सद्सद्विवेक बुद्धीच्या नरड्यावर टाच देऊन, पश्चात्तापाचं उचल खाणारं भूत, मी हा हा म्हणता कायमचं गाडून टाकीन.
प्रकरण ४
विराम
"आपल्या पुस्तकात ज्या अनेक उपयुक्त सूचना देण्यात आल्या आहेत, यापैकी माझ्या अनुभवाने तीन सूचना मला फारच आवडल्या. पहिली, भाषणाच्या तडाखेबंद गतीविषयी विद्यार्थ्यांना केलेली धोक्याची सूचना. दुसरी, सोप्या नि सरळ भाषाशैलीची आवश्यकता आणि तिसरी, बीचरच्या उद्धृत केलेल्या उक्तीतील सनातन सत्य - `धैर्य हाच वक्तृत्वाचा मूळ पाया.` हिंदुस्थानात या एकाच सद्गुणाची पूर्वीपेक्षा आज फार मोठी जरूरी आहे.``
- बॅ. मुकुंदराव जयकार यांचा अभिप्राय (ता. १८-४-१९१८)
विराम म्हणजे वाक्य बोलत असताना जागोजाग कमी-अधिक प्रमाणात थांबण्याची क्रिया. ही नैसर्गिक असते. सूक्ष्म विचार केला तर विराम ही एक शक्ती आहे. आघात झाला. का प्रत्याघात व्हायचाच, हा जसा निसर्गसिद्ध सिद्धांत आहे, तसाच आघात नि प्रत्याघात या दोन क्रियांमध्ये जो काल जातो, मग तो निमिषमात्र का असे ना, त्याला विराम म्हणतात.
एक क्षणभरसुद्धा न थांबता एकसारखे बराच वेळ बोलत रहाणे अशक्य आहे. स्वल्पविराम, अर्धविराम आणि पूर्णविराम यांची दमछाट घेतल्याशिवाय कोणाला काही बोलताच यायचे नाही. तसे कोणी करील तर त्याच्या फुप्फुसावर अतिशय वाईट परिणाम होतील. तसे न व्हावे यासाठीच विरामांची योजना असते. एका दमात एकसारखे बोलत रहाणेच जर अशक्य आहे, तर कोठेतरी थांबणेच अवश्य आहे. तसेच भलत्याच जागी गुदमरून थांबण्यापेक्षा, जागोजाग कमी अधिक प्रमाणात थांबून बोलणे हिताचे आहे.
विरामांनी नैसर्गिक क्रिया चातुर्याने उपयोगात आणली तर संभाषणे नि व्याख्याने परिणामकारक वठतात आणि आपल्याला विरामांच्या त्या गूढ शक्तीचा अनुभव पटतो. सावकाश भाषण करणे ही वक्तृत्वाच्या उत्कृष्टपणाची मुख्य खुबी आहे. वक्त्याची विचारसरणी किती सशक्त किंवा अशक्त आहे, याचा श्रोत्यांना येथेच अंदाज घेता येतो.
भाषण कसे निर्माण होते? प्रथम मनात विचार येतो. तो भावनेला चेतावतो. विचार प्रदर्शनासाठी भावना शब्दांना शोधते. शब्दांची पलटण तयार होताच ती उच्चाराने भराभर बाहेर पडू लागते. तिला गती असते. त्या गतीच्या कमी अधिक वेगावरून शब्दोच्चारांच्या स्वरांवरून आणि योजनेच्या कुशलतेवरून, श्रोत्यांना वक्त्यांच्या विचारांचे वजन, महत्त्व आणि किंमत अजमावता येते.
संभाषणात काय अथवा व्याख्यानात काय, प्रत्येक शब्द सावकाश उच्चारला म्हणजे आपल्या विचारांचा नि कल्पनांचा प्रवाह समधात सारखा वाहता रहातो. शब्दांची योजना ठाकठीक साधते. जागोजन विशेष कटाक्षाचे शब्द विविध स्वरांनी नि हलकाव्यांनी उच्चारून, आपल्या भावनांचे भिनभिन्न रंग भाषणशैलीत उमटविता येतात आणि बोलण्याच्या ओघात विरामांचा जागोजाग चातुर्याने उपयोग केल्यामुळे, वक्त्याची विधाने श्रोत्यांच्या मनाचा पुरा कब्जा घेतात.
व्याख्यान द्यायचे कशाला? आपले विचार दुसऱ्यांच्या मनावर बिंबवण्यासाठीच ना? मग हे काम शांतपणाने धिम्मेपणाने नि सावधानपणानेच केले पाहिजे. उच्चारला जाणारा प्रत्येक शब्द श्रोत्यांच्या मनावर किती, केवढा नि कसा परिणाम करत आहे. याचा क्षणोक्षणी अंदाज घेण्याइतका अवकाश भाषण चालू असतानाच राखता आला पाहिजे.
विरामशक्तीचा हा महिमा धिक्कारून भराभर एकामागून एक अव्यवस्थित शब्दांची बिनअंदाजी फैर झाडीत सुटणाऱ्याचा थोड्याच वेळात सगळा तोल सुटतो. त्याचे विचार सैरावैरा पांगतात. त्याचे शब्द त्याच्या स्वाधीन रहात नाहीत. नुसत्या भावना मात्र उचंबळतात, पण विचार नि शब्दांवर त्याचा ताबा रहात नाही. किंचित एकसारखा दिसणारा भलताच शब्द भलत्याच ठिकाणी पडून अर्थात अनर्थही घडतो. अखेर स्वारीची बोबडी वळते. तो भरमसाट उलटीसुलटी विधाने करू लागतो. घाबरतो, भांबावतो. मग काय! हुश्श हुश्श करून किंवा टाळ्या पिटून श्रोते त्याचे चऱ्हाट बंद पाडतात.
विरामांचा कसा नि किती उपयोग करायचा हे विचारसरणीच्या ओघानुसार ठरत असते. नव्हे आपण ते ठरवायचे असते. `दीर्घ विराम` हा विषयाचे महत्त्व आणि विचारांचा सखोलपणा ठरवतो. एखादे वजनपदार मत आणि महत्त्वाचे सत्य तत्त्व ह्यांचे प्रतिपादन करणारा वक्ता आपल्या भाषणाची गती हमखास सावकाश नि दीर्घ विरामाची ठेवतो.
कोळशाने चित्रे काढणाऱ्या चित्रकाराची करामत पहा. तो हातात कोळशाची कांडीच घेतो. दुसरे तिसरे काहीच घेत नाही. पण चित्रातल्या निरनिराळ्या छायेच्या छटा उमटविण्यासाठी काडीच्या दाबणीचे प्रमाण कोठे दाट, तर कोठे मध्यम, तर कोठे अगदी अलगद फिकट पुसट अशा पायऱ्यांनी दाखवून, एकाच फटकाऱ्यात प्रकाश नि छायेचा परिणाम (शेड अॅण्ड लाईटचा इफेक्ट) सफाईत उठवतो. विरामांनाही छायेच्या अशा अनेक पायऱ्या असतात. विचार, प्रसंग आणि वक्त्याची स्वतःची पात्रता ह्या तीन गोष्टींनी ह्या पायऱ्यांचा निर्णय ठरत असतो.
विराम म्हणजे कशीतरी वेळ काढण्याची सवलत नव्हे. बोलत असताना वक्ता जितका विचारात मग्न असतो, तितकाच ते विचारांच्या अवकाशातही असतो. पुढे येणाऱ्या विचारांचे शोधन करण्यात, त्यांचे यथासांग चित्रण कसे करावे ह्यांच्या बातबेतात आणि त्यासाठी लागणाऱ्या शब्दयोजनेची वजनदार घडण घडविण्यात तो अगदी तन्मयतेने गढून गेलेला असतो. ह्या अवकाशात श्रोतेसुद्धा वक्त्याच्या या विशेष मनःस्थितीशी संलग्न होतात. त्याच्या विचार शृखंलेची जुळणी अंदाजित असतात. त्याच्या शब्दयोजनेकडे उत्सुकतेने लक्ष लावून बसतात.
प्रख्यात अमेरिकेने वक्ते मि. वेब्स्टर (वेबस्टर म्हणजे प्रख्यात इंग्रजी शब्दकोशकार आणि तोही इंग्लंडकर असा पुष्कळांचा गैरसमज आहे. कोशकार वेबस्टर (१७८२-१८४३) हा अमेरिकन भाषाशास्त्री असून, त्याचे संपूर्ण नाव डॉ. नोहा वेबस्टर असे होते. ज्या वक्त्याची गोष्ट येथे सांगितली आहे तो, डॅनियल वेबस्टर (१७८२-१८५२). हा एक जबरदस्त वक्ता आणि मुत्सदी होता. त्याने अध्यक्षपदासाठीही लढा दिलेला होता. तिसरा जॉन वेबस्टर हा १७ च्या शतकातला इंग्लंडातला एक प्रख्यात नाटककार होऊन गेला.) यांची एक गोष्ट सांगतात. एका सार्वजनिक व्याख्यानात भाषणाचा ओघ सुरू असताना, वेब्स्टरना एका ठिकाणी एक विवक्षित शब्द वापरायचा होता. तो शब्द त्यांना काही केल्या आठवे ना आणि तोच नेमका शब्द योजल्याशिवाय त्यांना आपल्या मनातला भाव श्रोत्यांना नीट पटवता येण्यासारखा नव्हता.
वेब्स्टरनी मनातल्या मनात एकामागून एक अनेक शब्दांची चाचणी केली. पण छे! विरामाच्या या क्षणमात्र अवकाशात श्रोत्यांचेही लक्ष वक्त्यांच्या शब्दयोजन-चातुर्याकडे अगदी खेचून वेधले होते. या ठिकाणी वेब्स्टर साहेब कोणता शब्द घालतात, याची जो तो आतुरतेने वाट पाहत होता. इतक्यात योग्य तो शब्द वेब्स्टरना सापडला नि त्याची योजना होताच सारे सभागृह अभिनंदनाच्या टाळ्यांनी दणाणून गेले.
दुसरी गोष्ट लोकमान्य टिळकांची. इंग्रजी `ब्युरॉक्रसी` या शब्दाला तंतोतंत अर्थ छायेचा मराठी शब्द योजण्यासाठी लो. टिळक एका सभेत असेच थबकले होते. "इंग्रजांची ही ब्युरॉक्रसी - ब्युरॉक्रसी - ब्युरॉक्रसी – अहो, म्हणजे नोकरशाही," असा नवा शब्द तात्कालिक स्फूर्तीने त्यांनी योजताच, सभाजनांनी एक मिनिटापर्यंत टाळ्यांचा नुसता पाऊस पाडला. वेब्स्टर साहेब पूर्वी प्रचारात असलेला जुनाच शब्द शोधीत होते, पण टिळकांनी मराठी भाषेत एका नवीन शब्दाला जन्म दिला, याचे कौतुक काय लहानसान म्हणायचे?
हा जो विराम अथवा दीर्घकाळ थांबण्याची क्रिया, वेब्स्टर किंवा टिळक ह्यांनी स्वीकारली, त्याला `मूक व्याख्यान` हे नाव छान शोभेल. अशा मूक व्याख्यानाच्या अवकाशातच श्रोता नि वक्ता यांची हृदये सलग्न होत असतात आणि वक्त्याचे आत्मतेज (पर्सनल मॅग्नेटिझम) याच अवकाशात श्रोत्यांच्या मनावर आपली छाप पाडीत असते.
लॉर्ड पामर्स्टन यांचे एक उदाहरण पहा. इंग्लंडातले हे एक प्रसिद्ध विरामी वक्ते होते. एका सार्वजनिक व्याख्यानात एक श्रोता ओरडला- "अहो लॉर्डसाहेब, सरळ सवालाला सरळ जबाब द्यायची तुमची तयारी आहे काय?" `होय, असे उत्तर मिळताच, "त्या अमूक अमूक सुधारणेच्या बिलाला तुम्ही संमती देणार आहात काय?" लॉर्ड पामर्स्टननी अगदी दीर्घ विरामाने उत्तर द्यायला सुरुवात केली. आय विल् (I will) - ते थांबले. श्रोत्यांच्या एका भागातून टाळ्या कडाडल्या. पुढे म्हणाले - नॉट (Not) दुसऱ्या भागातून जोरदार टाळ्या, अखेर म्हणाले, - टेल यू (Tell you) मग हो काय विचारता? साऱ्या सभागृहात हशा नि टाळ्यांचा एकच गोंधळ उडाला.
भाषणाची गती
विरामाच्या जोडीने भाषणाच्या गतीचाही विचरा अगत्याने आहे. गती अतिशय मंद नसावी. नाहीतर श्रोते जांभया देऊ लागायचे, पण अतिशय जलदही नसावी, मग या प्रकरणातला सारा बोधच फुकट जायचा. अतिशय जलद बोलणाऱ्या वक्त्याच्या भाषणाचा श्रोत्यांवर चांगला परिणाम होत नाही. ते उथळपणाचे लक्षण `आहे. तेव्हा, ठीक दिसे एक मध्यमावस्था हा नियम बरा. तसेच सगळ्या भाषणात गतीचे एकच प्रमाण ठेवून भागायचे नाही. विषयाचे महत्त्व, विचार, विकारांची कमी-अधिक आच भावनांची उठावणी इत्यादी अनेक मुद्दयांना अनुसरूनच गतीचे प्रमाण मंद, कधी मध्यम, तर कधी तीव्र असेल. हे सारे अनुभवाने ठरत असते, नि ठरवावे लागते. तथापि पुढील तक्ता विद्यार्थ्यांसाठी मागदर्शक होईल.
गतीचे प्रमाण - विविध विकार परिस्थिती
अति मंद - गांभीर्य, प्रौढपणा, विचारपूर्णता
मंद - संशय, दुःख, शांती
मध्यम - निर्विकार भाषण
त्वरित - प्रसन्नता, उल्हास, रंगेलपणा, निर्भत्सना
अतित्वरित - क्रोध, द्वेष, त्वेष, सर्वसामान्य प्रक्षुब्धता
व्याख्यानाची जागा
भाषणाची गती आणि आवाजाचे परिणात (व्हॉल्यूम) ठरविताना, व्याख्यानाच्या जागेचाही मुद्दा विचारात घेतला पाहिजे. जागा उघडे मैदान, पटांगण आहे का चोहो बाजूंनी बंद असलेला हॉल अथवा दिवाणखाना आहे, तेथे भाषणाचा प्रतिध्वनी उमटतो की काय, उमटत असल्यास किती, हे पाहिले पाहिजे. मायक्रोफोन असला तरी कित्येक उघड्या जागा अशा असतात की तेथे आवाजाचा प्रतिध्वनी हमखास उमटून व्याख्यानात व्यत्यय येतो.
माईकवरही राणा भीमदेवी थाटात आरडाओरडा करणारे रावणी वक्ते असले मग तर काय, त्या ध्वनी प्रतिनिधींचा गोंगाट सगळ्या कार्यक्रमाचा विचका करतो. हा प्रतिध्वनीचा मुद्दा नीट ध्यानात ठेवून, भाषण धिम्मेपणाने सावकाश आणि अतिशय स्पष्ट वाणीने करावे. आपल्या पूर्वी बोलून गेलेल्या वक्त्यांच्या भाषणाचा श्रोता या नात्याने आपल्यावर काय परिणाम झाला, तो लक्षात घेऊनच आपल्या भाषणाची गती आणि आवाजाचा व्हॉल्यूम ठरवावा.
प्रकरण ५
कटाक्ष म्हणजे शब्दाऽघात
संभाषण अथवा व्याख्यान चालू असताना काही ठरावीक शब्द अथवा छोटी वाक्ये, श्रोत्यांच्या मनावर विशेष बिंबवण्यासाठी, किंचित ठासून म्हणजे आवाजाला हिसडा देऊन बोलण्याची जी क्रिया, तिला कटाक्ष अथवा शब्दाऽघात (एम्फसिस) म्हणतात. कटाक्षाचा शब्द आवाजाची टीप किंचित वाढवून दर्शवायचा असतो. मात्र तो त्या ठरावीक शब्दापुरताच असला पाहिजे. आघाताचा शब्द कोणता, आपल्या विचारात त्याचे महत्त्व कोणते नि किती आणि आघाताने आपल्याला कोणता मुद्दा श्रोत्यांच्या मनावर बिंबवायचा आहे, ह्याची स्पष्ट कल्पना असावी. भलत्याच शब्दावर आघात केल्याने वाक्यांचा अर्थही बदलतो. आपल्याला सांगायचे असते एक आणि अर्थ निघतो भलताच. हे घ्या उदाहरण :
कोल्हापूर संस्थान विलीन का न व्हावे?
यातील `का` वर आघात केला तर एक अर्थ निघतो आणि `न` वर केला, तर दुसराच अर्थ होतो, पहा कसा तो -
१) विलीन का व्हावे? (का होऊ नये? झालेच पाहिजे)
२) विलीन का न व्हावे? (विलीन होताच कामा नये, ह्याची कारणे देतात)
कटाक्षाच्या शब्दयोजनेचे काम चतुराईचे असते. विचारांचा ओघ आणि सांगण्याचा मुद्दा नीट अजमावा लागतो. दुसऱ्याचे विचार वाचून दाखवताना, म्हणजे वाचन वाचताना, प्रत्येक वाक्यातला नि शब्दातला लेखकाचा भाव काय आहे, हे स्पष्ट उमगले तरच त्याच्या लेखनातील आघाताच्या जागा समजतात.
डोक्यात विचार येतात. कल्पनांच्या लाटावर लाटा उसळू लागतात. सगळ्याच आपण व्यक्त करू शकतो, असे थोडेच आहे? शंभरापैकी फार तर १०-५ चा उपयोग साधतो. हे १० किंवा ५ विचार कोण्या क्रमाने व्यक्त करायचे, हे चटकन ठरवावे लागते. नंतर एकेक विचार एकाग्र चित्ताने, सावधानपणे बोलून दाखवायचा असतो. ही पद्धत अंगवळणी पडली की शब्दाऽघाताच्या जागा आपोआप उमगू लागतात. पद्धतशीर अभ्यासाच्या वाचनाने हे आपोआप समजू लागते.
स्वरांची कमी-जास्त प्रमाणांची वाकवणी (इन्फ्लेक्शन) शब्दाऽघात वठविण्याच्या कामी छान उपयोगी पडते. स्वरोच्चारांच्या कोमल तीव्र मनोहर चढणी उतरणी शब्दाऽघातांना सुंदर उठाव देतात. उत्तम रीतीने काळजी घेऊन वाढविलेल्य निरोगी मुलांच्या आणि सुसंस्कृत घराण्यातील तरुणींच्या आवाजात हा स्वरांच्या वाकणीचा प्रकार उत्तम आढळतो. पटाईत गवयांच्या मुरकीत तर ही क्रिया अभ्यासण्यासारखी असते.
एखाद्या शब्दाच्या नंतर थंबण्यापेक्षा, आधीच थांबणे अधिक उठावदार नि परिणामकारक होते. यावेळी श्रोत्यांच्या मनाची स्थिती क्षणमात्र आतुर नि आशाबद्ध झालेली असते. वक्ता आता काय बोलणार, इकडे त्यांचे सारे लक्ष वेधून राहिल्यामुळे, पुढे उच्चारला जाणारा शब्द साहजिकच त्यांच्याकडून अलगद झेलला जातो नि त्याचा परिणामही चांगला होतो. म्हणूनच, भरभर बोलण्यापेक्षा वाचर करून सावकाश बोलण्याची पद्धत अधिक यशस्वी का होते, ह्याचे मर्म येथेच आहे. शब्दोच्चारापूर्वी वक्ता जसा मनातल्या मनात शब्दांचे परीक्षण आणि वजन करीत असतो, तसे श्रोतेही त्याच्या उच्चारलेल्या शब्दांची तितक्याच आस्थेने प्रशंसा करतात.
वक्त्याला वास्तविक काय साधायचे असते? अंतःकरणातले विचार आणि विकार श्रोत्यांच्या मनावर उमटावयाचेच असतात ना? श्रोत्यांना तात्काळ आपणासारखेच करायचे असते ना? झाले तर. हृदयात विकार उन्मळून, विचारांच्या साहायाने ते शब्दरूप ध्वनीने बाहेर पडू लागले, का आपोआप आरोहावरोह, खाचाखोचा, वळणे, वाकणे, शब्दाऽघात इत्यादी स्वरांची कार्ये सहजगत्या घडून येतात.
लेखक वक्त्याचे दोन भेद
लेखक वक्त्याचे नेहमी मी दोन भेद करीत असतो. एक वर्ग डोक्याने लिहितो-बोलतो, तर दुसरा काळजाने लिहितो-बोलतो. डोकेवाल्याची भिस्त त्याच्या विद्वत्तेवर, पांडित्यावर आणि केवळ शब्दसंग्रहावर असते, तर काळीजवाल्याचा सारा भर त्याच्या भावनांच्या उमाळ्यावर नि प्रवाहावर असतो. पहिला शब्दपांडित्य करतो, म्हणून त्याला शास्त्राचे नि नियमांचे दास्य पत्करावे लागते. दुसरा तळमळीचा भक्त असल्यामुळे, त्याच्या भावना यथायोग्य शब्दात आपोआप उमटत असतात. सारांश, लिहिण्यात काय अथवा बोलण्यात काय, हृदयाची प्रामाणिक तळमळ, व्यासंगाचा नि व्यवहारी अनुभवांचा आत्मविश्वास, हे बिनमोल वक्तृत्वाचे भांडवल आहे.
शब्दाऽघाताचे सर्वसामान्य नियम
१. नवीन विचारांची मुख्य कल्पना
२. महत्त्वाचे शब्द
३. तुलनात्मक शब्द
४. उभयान्वयी अव्यय
५. विचारांत एकदम बदल करणारे शब्द
६. विपर्यासी अथवा विरोधात्मक शब्द
७. शब्दविपर्यासाचे बहुधा दोन्ही शब्द, ह्यावर शब्दऽघात करावा, परंतु -
अ) पादपूर्णात्मक शब्द अथवा वाक्ये
ब) केवळ विचारांची गती पुढे नेणारे शब्द
क) कृत्रिम शब्दविपर्यास दर्शवायचा असेल तर, शब्दाऽघात करू नये.
निरनिराळ्या शब्दांवर आघात केल्यामुळे, एकाच वाक्याचे अर्थ कसे बदलतात ते पहा -
(१) म्हातारा धोंडू मेला काय?
`म्हातारा` शब्दावर आघात केला तर, (म्हातारा धोंडू मेला होय? मला वाटले तरणा धोंडू मेला.)
`धोडू` शब्दावर आघात केला तर, (धोंडू होय? मी समजलो पांडू.)
(२) दारिद्र्य आणि मरण यातून तुला कोणते बरे वाटते?
अ) `यातून` शब्दावर आघात - फक्त या दोहोतून निवड कर.
ब) `तुला` शब्दावर आघात - तुझी निवड, तुझे मत सांग. इतर काय म्हणतात ते नको.
क) `कोणते` शब्दावर आघात - जे बरे वाटते ते सांग. दुसऱ्याचा नामनिर्देशही नको.
ड) `बरे` शब्दावर आघात - (वाईट वाटते ते नको सांगू)
शब्दाऽघातामुळे वाक्याचे अर्थ कसकसे बदलतात, हे विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयोग करून अभ्यासीत असावे, म्हणजे योग्य कटाक्षाच्या जागा कोणत्या, हे उमगत जाईल.
शब्दाऽघात म्हणजे आकांडतांडव नव्हे
वाजवीपेक्षा फाजील आवाजाने शब्दाऽघात करण्याची पुष्कळांना सवय असते. ती टाकली पाहिजे. कोणत्या शब्दावर आघात करायचा आहे, याचा काहीही विचार न करता, भरमसाट आरडाओरड्याने नि हातवाऱ्यांच्या आकांडतांडवाने, मन मानेल त्या शब्दावर नि वाक्यावर आदळाआपाट करणारे वक्ते (त्यांना वक्ते म्हणावे काय?) श्रोत्यांच्या विश्वासाला नि आदराला सपशेल मुकतात. असले नमुने पाहायचे असतील तर `सोपबॉक्स ओरेटर्स` (म्हणजे चवाट्यावर भाषणपंची गाजवणारे प्रचारक) पहा. समोर मायक्रोफोन असताही, हे लोक सणसणाट्या आवाजाने, हातांच्या वळलेल्या मुठी हवेत सारख्या भिरकावीत, पिंजारलेल्या झिंज्यांचे डोके फलकावीत, दातओठ खात तावातावाने भाषणे करतात.
प्रचारतंत्रात या अलललल डुर्र पद्धतीला आणा दोन आणे किंमत असलीच, (ती नसतेच मुळी) तरी श्रोत्यांच्या टाळ्या मिळवण्यापलीकडे विशेष काही फलश्रुती त्यांच्या पदरात पडत नाही. असल्या भाषकांपुढे जमणारे लोक श्रोते नसून, नुसते तमासगीर असतात. तमाशा पाहतात आणि जातात. भाषणतले मुद्दे जातात हवेवर उडत. हा प्रकार अजिबात टाळला पाहिजे.
शब्दोच्चाराने केलेला अनर्थ
रंगभूमीवर प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे ही. गुप्त वेषाने आलेला एक राजपुत्र गुप्तपणाने आपल्या प्रेयसीला अकस्मात भेटतो. तिच्या जुलमी बापाने त्या राजपुत्राच्या बापाचा खून करून सत्ता बळकावलेली असते. राजपुत्राचाही खून करण्यासाठी त्याने देशोदेशी मारेकरी पाठविलेले असतात. शिवाय, त्या राजपुत्राच्या सौंदर्यवान मातेला तुरूंगात ठेवून त्याने तिचा छळ चालविला होता. कसेही करून आपल्या दुःखी मातेला भेटावे, निदान डोळे भरून तिचे दर्शन घ्यावे, ही राजपुत्राची इच्छा. इतक्यात त्याला राजकन्या हुडकून काढते. राजपुत्र उघडकीला आला तर आपला बाप त्याचा जीव घेईल, म्हणून राजकन्या त्याला मातेच्या भेटीपासून परावृत्त करण्याचा यत्न करते.
त्या राजकन्येची आई मरण पावलेली असते. मातृदर्शनाला तिने विरोध करू नये म्हणून राजपुत्र तिच्या मातृप्रेमाला डिवचण्यासाठी काकुळतीने विचारतो - "कमल, तुला नाही का तुझ्या आईची आठवण येत?” या दोन शब्दांचा `तुझ्या आय्ची` असा उच्चार करताच श्रोत्यांनी काय हलकल्लोळ केला असेल, याची कल्पना करून पहा.
कटाक्ष समजून वाचा
१) संभाजी (कमालीच्या शांतपणे) : सबूर राणीसाहेब. तुम्ही वृथा क्षोभ करून घेऊन नका. गेल्या दोन वर्षाच्या अनुभवानं आम्ही विषारी शब्दच नव्हे तर साक्षात विषदेखील पचवायला शिकलो आहोत. गणोजीराजे, समजुतीनं घ्या - तुमच्या वडिलांनी केलेली मागणी आणि आमच्या आबासाहेबांनी दिलेलं उत्तर - दोन्ही इतिहासजमा झाली. कोण बरोबर, कोण चूक, हा सिलसिला घटकाभर सोडून द्या. क्षणभर स्वतःला आमच्या जागी कल्पून जरा विचार करा. गणोजीराजे, आपल्या प्रत्येक सेनापतीने तुमच्यासारखाच केवळ वचनाचाच हट्ट धरून ह्या चिमुकल्या हिंदवी राज्याचे लचके तोडायचं ठरवलं तर स्वराज्याची काय गत होईल?
- इथे ओशाळला मृत्यू : अंक १ ला पृ. १९
२) भागवत धर्म हा महाराष्ट्राचा आवडता धर्म आहे. त्याच्याशी मराठमोळ्याच्या मनाचे फार साम्य आहे. तो जात्या फार प्रेमळ आहे, पण त्याचा चिवटपणा लोकोत्तर आहे. तो ह्या एका राष्ट्राचा आहे पण त्याच्या पोटात सर्वांची सोय होऊ शकते. तो मऊ आहे, पण त्याच्यात बुद्ध, जैन, महमंदी वगैरेसारख्या धर्माशी झगडून त्यांना हटवण्याचे सामर्थ्य आहे.
कोणी कर्मठ, ज्ञानी व योगाभ्यासी आणि म्लेंच्छविंद्येचे पंडित म्हणतात की, त्यात विशेष असे काही नाही, पण खरे पाहता, त्यात सर्वस्व आहे. ह्या धर्माचे व ह्या पंथाचे मुख्य इंगित असे आहे की, त्यात रावापासून रंकांपर्यंत, जाणत्यांपासून नेणत्यांपर्यंत, ब्राह्मणांपासून चांडाळापर्यंत स्त्रियांसुद्धा सर्वांची सोय केली आहे व सर्वांची काळजी वाहिलेली आहे. ह्याचे ठिकाण सर्वांची एकवाक्यता होऊ शकते. यात उदासीनता रहात नाही. निराशेला जागा नाही. उच्चनीचभावाला वाव नाही. असा हा भागवतधर्म आहे.
- महाराष्ट्र सारस्वत : पान २२६
प्रकरण ६
वाचन
वाचन हा वक्तृत्वकलेचा मुख्य पायाच होय. ह्या कलेचे सारे मर्मच येथे साठविले आहे. पूर्वी शालेय शिक्षणात, अगदी प्रथमावस्थेपासूनच, वाचन विषयाला मोठे महत्त्व देण्यात येत असे. दररोज वाचनाचा एक तासच असायचा आणि त्यावेळी आरोहावरोह, विराम, शब्दाऽघात इत्यादी स्वरोच्चारांविषयी विशेष काळजी घेण्यात येत असल्यामुळे, तत्कालीन विद्यार्थ्यांची वाणी, शब्दोच्चार आणि बोलण्याची धाटणी उत्तम असे. ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वार, विसर्गाचा विवेक रहात असे.
आजच्यासारखा निरनिराळा ह्या शब्दातील नि ऱ्हस्व असतानाही नीरनिराळा असा लांब दीर्घ उच्चार करणाऱ्या शहाण्यांचा वर्ग दिसत नसे. फार काय, पण कित्येकांना `वक्तृत्व` हा शब्दही नीट उच्चारता येत नाही. ते त्याचा उच्चार वकृत्व असाच करतात. याचे कारण वाचन विषयाकडे झालेले दुर्लक्ष. गेल्या ५० वर्षांतल्या वाचन विषयाच्या या शालेय हेळसांडीमुळे कित्येक साहित्यिकांना आपली मराठी भाषा व्याकरणशुद्ध बोलता येत नाही. लिहिलेला मजकूर तादात्म्याने, यथातथ्य स्वरोच्चाराने आणि सहजपणाने वाचता येत नाही. जुन्या प्राथमिक शाळेतले मास्तर मुलांना सांगायचे- "लेको, वाचायचं असेल तर नीट वाचा. नाही तर मरा."
वाचनाबरोबरच हल्लीच्या शालेय शिक्षणक्रमात पाठांतरावर बहिष्कार पडल्यामुळे विद्यार्थ्यांची पाठांतरशक्ती कमजोर झाली आहे. सुभाषिते, कविता, श्लोक, इतिहासातील किंवा नामांकित ग्रंथकारांचे उतारे, प्रसंगाला तात्काळ तोंडपाठ म्हणून दाखविण्याची ताकद अगदी कमजोर झाली आहे. वक्तृत्वाच्या बाबतीत ही फार मोठी हानी आहे.
गुरुसन्निध ग्रंथवाचन
गुरुसन्निध वाचनदीक्षा हा एक योग आहे. नामदार गोपाळ कृष्ण गोखले आणि न्यायमूर्ती चंदावरकर हे दोघे न्यायमूर्ती रानड्यांचे `रीडर` (वाचक) होते. दररोज निरनिराळे ग्रंथ, वर्तमानपत्रे, सरकारी प्रतिवृत्ते इत्यादी कितीतरी साहित्य त्यांना वाचावे लागत असे. त्यांनी वाचायचे आणि न्यायमूर्तींनी ते ऐकायचे. कोठे काही शब्दोच्चारात चुकले, शब्दाऽघाताने अर्थाचा अनर्थ होत असला, एकंदर वाचन हृदयशून्य किंवा मन लावून होत नसेल, तर चटकन सूचना किंवा इशारा द्यायला, फार काय पण कानही पिरगळायला न्यायमूर्ती रानडे तात्काळ सिद्ध होत असत. मधूनमधून वाचलेल्या मजकुराचा सारांश ते विचारायचे किंवा दहा पाने मजकुराचा मतितार्थ एक-दोन पानात मुद्देसूद लिहायला लावायचे. त्या स्वाध्यायामुळेच चंदावरकर व गोखले ह्यांच्या लौकिकवान वक्तृत्वशैलीचा पाया बसला. अशी संधी सर्वांना थोडीच मिळणार? मग काय करायचे? द्रोणाचार्याने धिक्कारलेल्या एकलव्याने आचार्याच्या मातीच्या पुतळ्यासमोरच, त्यांना आपले `संनिध गुरू` कल्पून, धनुर्विद्येचा जसा अभ्यास केला, तोच स्वावलंबी मार्ग वक्तृत्वाच्या विद्यार्थ्यांनी पत्करला पाहिजे.
रेडिओची वाचन-कसोटी
भाषकाच्या भाषणशैलीचा बरावाईटपणा ठरविण्याच्या कामी सध्या रेडिओ ही एक जबरदस्त कसोटी झाली आहे. रेडिओवरची भाषणे आधी लिहून काढावी लागतात आणि मग ती मायक्रोफोनपुढे वाचावी लागतात. बोलण्याचा मजकूर `लिहावा` कसा आणि लिहिलेला मजकूर `बोलावा` कसा, हे पुष्कळांना साधतच नाही. व्यवहारात आणि चारचौघांत बोलण्याच्या भाषेची धाटणी आणि पत्र, अर्ज किंवा निबंध लिहिण्याच्या भाषाशैलीची धाटणी अगदी भिन्न भिन्न असतात.
नाटकातल्या विविध पात्रांची संभाषणे आणि वृत्तपत्री निबंधलेखन ह्या दोहोच्या भाषाशैलीत फार भेद असतो. पात्रांची भाषा प्रत्यक्ष बोलण्याची असावी लागते. निबंधाची भाषाशैली फक्त वाचण्याच्या कामी उपयोगी पडते. शिवाय वाचन `वाचण्याची` शैली किंवा कलाच आजकालच्या मंडळींना पाठमोरी असल्यामुळे, त्यांनी निबंध वजा लिहून आणलेली भाषणे रेडिओवर वाचताना त्यांची तिरपीट उडते.
कायस सीझरची एक गोष्ट सांगतात. एकजण काही वाचीत होता. कायस सीझरने त्याला हटकून म्हटले, "काय रे बाबा काय करतो आहेस तू? वाचतोस का गातोस? गात असशील तर तुझे गाणे अगदी भिकारडे आहे. बरं मी `वाचीत आहे` असे म्हणशील, तर निस्संशय तू गात आहेस." बोलण्याची भाषा वेगळी आणि लिहिण्याची भाषा वेगळी हा भेद ज्यांना नीट उमगला, तेच रेडिओ वक्ते आपली `भाषणे` बोलण्याच्या भाषाशैलीने लिहून, स्वाभाविक स्वरोच्चारांनी मायक्रोफोनवर `वाचून` दाखविण्याच्या कसबात यशस्वी होतात.
वाचन कसे करावे
ग्रंथवाचन म्हणजे दुसऱ्याचे लिहिलेले विचार आपण वाचायचे. दिसते तितके हे काम सोपे नाही. विषय काय आहे, त्यात लेखकाच्या विचारांची भूमिका काय आहे, लेखनाचा हेतू कोणता, विवेचनात भावना नि कल्पना कशा खेळवल्या आहेत, भाषाशैलीचा ओघ कसा आहे, याचा चटकन अंदाज आधी घेतला पाहिजे. वाचन करताना वाचणाऱ्याने प्रत्यक्ष लेखकाच्या भूमिकेशी तद्रूप झाले पाहिजे. जो मजकूर मी वाचणार, तो जणू माझ्या स्वतःच्याच कल्पनेचा, भावनांचा हेतूचा शब्दपट आहे, मीच तो लेखक आहे, अशा भूमिकेने वाचन करावे लागते. आपले वाचन चालले असताना, शेजारच्या खोलीतल्या मंडळींना `आपण कोणाशी तरी जिव्हाळ्याचे बोलत आहोत,` असाच भास झाला पाहिजे.
वाचनातल्या मजकुराचे विचार हे माझे स्वतःचे आहेत आणि ह्या क्षणाला जगात ते मी प्रथमच बोलून दाखवीत आहे, इतकी तद्रूपता आणि तन्मयता वाचनात असावी लागते. नाटकातली पात्रे जी भाषणे रंगभूमिवर बोलतात, ती काय त्यांची स्वत:ची असतात? नाटककाराने ती लिहिलेली असतात. पण ती पाठ करताना, ही भाषणे माझी आहेत, ह्या तन्मय भावनेनेच ती आधी वाचावी लागतात. त्या वाचनात आपुलकीचा भाव आधी निर्माण करावा लागतो. भूमिका एकदा समजली की मग स्वरोच्चारादी तपशील आपोआप भाषणात उमटू लागतो.
वाचनात लेखकाची जागा वाचकाने घ्यावयाची असते, हेच वाचनाचे मर्म. वाचनातली तन्मयता हळूहळू आपल्या नेहमीच्या संभाषणात, भाषणात आणि व्याख्यानात येऊ लागते आणि त्याचा इष्ट परिणाम इतरांवर होत असल्याचे समाधान मिळते.
उत्तम ग्रंथांचेच वाचन करावे
या बाबतीत जॉन ब्राईट ह्या सुप्रसिद्ध इंग्लिश वक्त्याचा अनुभव अनुकरण्यासारखा आहे. तो म्हणतो, "माझ्या वक्तृत्वाची शैली जर चांगली असेल तर ती मी चांगले ग्रंथ वाचल्यानेच कमावलेली आहे, हे लक्षात ठेवा. भाषणात फार थोडे पण उत्तम शब्द वापरावे. उत्तम म्हणजे सोप्यातले सोपे (बालबोध) पण जोरदार. विशेषणांचा फाजील उपयोग करू नका. पुष्कळ विशेषणे वापरल्याने भाषणाची नि लिहिण्याची खराबी होते. हे सगळे साधण्यासाठी उत्तम पुस्तकांचे म्हणजे उत्तम लिहिलेल्या, उत्तम छापलेल्या नव्हे, पुस्तकांचे वाचन फार उपयोगी पडते. असल्या वाचनाने, उत्तम भाषा कोणती, याचा कान, डोळे आणि मन यांना घनिष्ठ परिचय होत जातो."
वाचन मोठ्याने करावे
स्वरांना नीट वळण लावण्याच्या कामी, दररोज नियमाने, निदान अर्धा तास तरी मोठ्याने वाचन करणे अनेक दृष्टीनी फायदेशीर होते. प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट करावा. मजकुरातला अर्थ, त्यातला विचार आणि प्रगट करण्याचा विकार, नीट समजून वाचन केले म्हणजे ते बरे का वाईट, हे आपले कानच आपल्याला सांगतात. व्यवहारात आपण नेहमी जसे बोलतो, त्याच धाटणीने वाचावे. रोज नियमित वाचनाच्या पद्धतीने स्वरांचे सर्व दोष नाहीसे होतात, आवाजाला एक ठाकठिकी येते आणि शरीरप्रकृतीवरही त्याचा चांगला परिणाम होतो. कंठातील स्वरतंतू आणि फुप्फुसांना व्यायाम मिळतो.
नेत्रवाचन आणि मुखवाचन
समोर येणारा हर एक छापील मजकूर आपण नेहमी मोठ्याने वाचतोच, अथवा वाचलाच पाहिजे असे नाही. बहुतेक मजकूर वाचण्याचे काम आपले डोळेच करीत असतात. पण स्वरांच्या आरोग्यासाठी, वर्धनासाठी आणि कमावणीसाठी जे तास अर्धा तास वाचन करायचे, ते मात्र हमखास मोठ्याने केले पाहिजे. दुसऱ्याच्या समोर वाचावे कसे? असला भेदरटपणा कामाचा नाही. तो घालविलाच पाहिजे. यासाठी प्रथम दैनिक वर्तमानपत्रातील बातम्या, काही मनोरंजक भाग तरी घरातल्या मंडळींना मुद्दाम मोठ्याने वाचून दाखविण्याचा उपक्रम करीत जावा, म्हणजे धीर येत जाईल. लेखकाची भाषाशैली नि कल्पनाविलास वाचकाला जागोजाग नवनव्या पोषाखात नटलेले दिसतील.
एकाच शब्दाचा अनेक परीने कसा उपयोग करता येतो, एकच कल्पना किंवा भावना निरनिराळे लेखक कसकसल्या भिन्नभिन्न रंगांनी रंगवतात, ह्याचा तुलनात्मक अभ्यास केल्याने आपल्याही कल्पना शक्तीला चांगली धार लागत जाते. त्याचप्रमाणे निरनिराळे विकार उमटविण्याच्या कामी सप्तस्वरांचे आरोह, अवरोह, वाकवणी कशी नि का करणे प्राप्त असते, याचेही ज्ञान आपोआप होत जाते.
नवशिक्यांनी प्रथम व्याख्याने वाचावी
नवशिक्या उमेदवाराने सुरुवातीला आपली भाषणे नीट लिहून काढून ती सभेत वाचण्याचा उपक्रम करावा. म्हणजे पुढे जाहीर सभांत व्याख्याने देण्याच्या कामी सभाधीटपणा, भाषणाचा अस्खलित ओघ आणि उच्चारल्या जाणाऱ्या आपल्या शब्दांनी श्रोत्यांवर होणाऱ्या परिणामांची अटकळ त्याला नीट होईल. येथे एक महत्त्वाची सूचना आहे. त्याने आपल्या व्याख्यानाचा विषय आपल्या आवडीचाच निवडावा. ज्या विषयाची त्याला चांगली माहिती नसेल, त्यातल्या तत्त्वांची ओळख नसेल, ते विषय टाळावे. आवडीचा विषय असला म्हणजे तो वाचताना वाचक वक्त्याला तन्मयतेने तो `बोलता` येईल. तो व्याख्यान `वाचीत` असला तरी सभेत ते त्याला `बोलायचे` असते. नुसते वाचायचे नसते.
स्वतःच्या आवडीच्या विषयावर काही दिवस व्याख्याने - वाचताना अनुभव घेतल्यानंतर त्याने लोकाभिरूचीच्या मुद्द्यालाही हात घालावा. लोकांना कोणता विषय आवडतो, त्यावरचे प्रवचन ऐकताना ते उद्दीपित होतील काय, त्यांच्या चित्तवृत्ती आकर्षिण्यासाठी कोणते विचार नि मुद्दे कोणत्या भाषाशैलीने मांडावे आणि ते तन्मयतेने (किंबहुना अगदी अधिकारीवाणीने) कसे वाचून दाखवावे, हा प्रयोग करावा.
स्वरांचे आरोहावरोह, ठाकठीक शब्दांवर नेमके आघात, पद्धतशीर विराम, सावकाश वाचण्याची शैली आणि विचारांच्या रागरंगानुसार भिन्नभिन्न आवाजांच्या लहरींनी ते व्याख्यान - वाचन झाले तर श्रोत्यांची मने खास वेधली जातील. समजा, त्या तुमच्या लिखित भाषणात दोन व्यक्तींच्या संभाषणाचा भाग असला, तर तो भाव्युक्त किंचित भिन्न आवाजाने वाचल्यास, श्रोत्यांवर तेव्हाच छाप पडेल. यासाठी आपले लिहिलेले व्याख्यान आधी घरी चांगले ५-१० वेळा तन्मयतेने आणि अभिनयासह वाचण्याची तालीम घेणे आवश्य आहे.
ई. डब्ल्यू. कॉक्स आपला एक अनुभव सांगतात. "माझ्या ओळखीचा एक वाचक वक्ता आहे. त्याला एखाद्या ठिकाणी रात्री सभेत विषय वाचायचा असला, का साऱ्या दिवसभर त्या वाचनाची तो एकसारखी तालीम घेत असायचा. मग त्या वाचनाचा विषय नवा असो, जुना असो, पूर्वी वाचलेला नि तोंडपाठ झालेला असो किंवा नसो, त्याची तालीम झालीच पाहिजे, असा त्याचा संकल्प ठरलेला. या तालमीत प्रत्येक शब्द नि त्याचे अवयव यांचा उच्चार स्पष्ट, विचारपूर्ण नि भावयुक्त होतो का नाही आणि लिहिलेल्या विषयाचे तंतोतंत प्रतिबिंब आपल्या वाचनाने पडत आहे का नाही, याचा वरचेवर तो पडताळा पहात असतो.
लिहिलेल्या व्याख्यानाच्या वाचनांच्या पुष्कळ तालमी घेतल्या म्हणजे एक अप्रत्यक्ष फायदा होत असतो. त्यातला बराचसा भाग तोंडपाठ होतो. काळजीपूर्वक लिहिलेल्या वाक्यरचना मुखोद्गत होऊन कायमच्या अंगवळणी पडतात. एरवी काही नवा मजकूर वाचताना वाचकाचे तोंड आणि डोळे खाली कागदावर भिडलेले असतात. व्याख्यानात वक्ता आणि श्रोता यांचे डोळे समोरासमोर भिडावे लागतात. खालीमुंडी वाचनाने ते जमत नाही. पण लिखित व्याख्यानातला बराचसा भाग तोंडपाठ झालेला असला म्हणजे तेवढ्यापुरते तरी श्रोत्यांच्या डोळ्यांना डोळा भिडवून बोलण्याचे कार्य साधता येते आणि त्याचा परिणाम उत्तम होतो. थोडेसे वाचन आणि बरेचसे श्रोतासन्मुख भाषण असा तो प्रकार होतो. तो साधावा.
एक शंका - समाधान
बोलायचे भाषण वाचणे, हा जर गौन पक्ष मानायचा, तर मोठमोठे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, मंत्री, मुत्सद्दी, दरबारी वकील अधिकारी जेव्हा पहावे तेव्हा हातात भाषणाचे कागद घेऊनच वाचत असतात. हे काय? त्यांना समयस्फूर्त भाषणे करताच येत नाहीत की काय? अशी ही शंका.
खरे पाहिले तर काही थोडेसे अपवाद बाद करता, बऱ्याचशा थोरथोर व्यक्तींना वक्तृत्वाची कला अवगतच नसते. त्या दिशेने त्यांनी काही यत्नही केलेला नसतो. योगायोगाने ते अकस्मात उच्च पदावर जातात. तेथे पदोपदी भाषणांची नि व्याख्यानांची जरूरी पडते. म्हणून ते आपली भाषणे आधी लिहून किंवा कोणीतरी हुशार सहाय्यकाकडून लिहवून घेऊन, केवळ नुसती वाचतात आणि वेळ मारून नेतात. ते त्यांचे वाचनही तितकेसे तन्मयतेने होतेच असे नाही. कृत्रिम नि यांत्रिक होते. पण `थोर माणूस` म्हणून लोक माना डोलावतात नि टाळ्या पिटतात, इतकेच.
भाषण-वाचनाची आवश्यकता
जॉन ब्राईट ह्या मुत्सद्याला एकदा फार महत्त्वाच्या राजकारणी भानगडीवर पार्लमेण्टात भाषण करावयाचे होते. त्यांनी ते मुद्दाम लिहून आणले आणि वाचायला सुरुवात केली. १५ मिनिटांच्या आत सभाजनांचे बूट टेबलाखाली खडाडू लागले. काहीजणांनी निरनिराळे आवाज काढले. काही लोकांनी टेबलावर डोकी टेकली आणि घोरण्याचे आवाज चालू केले. ब्राईटना वाटले की हा सारा विरोधी पक्षवाल्यांचा चावटपणा चालू आहे. ते संतापले. ताडकन त्यांनी हातातले भाषणाचे पुडके टेबलावर आदळून, आवेशाने समयस्फूर्त बोलू लागले. एक तासभर त्यांनी आपल्या भाषणाने सभागृहाला नागासारखे डोलायला लावले.
पंडित जवाहरलाल नेहरू पट्टीचे स्वयंस्फूर्त (एक्सटेम्पोर) वक्ते होते. हृदयाची कळकळ हा त्यांचा स्वभावविशेषच असल्यामुळे, हवे तेव्हा हव्या त्या विषयात ते चटदिशी तन्मय होऊन अस्खलित बोलू लागत. पण हेच पंडितजी जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या राजकारणी अथवा तितक्याच जबाबदारीच्या राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर, मुत्सद्यांच्या बैठकीत अथवा परिषदेत बोलायचे असले म्हणजे सर्व भाषण आधी नीट मुद्देसूद तयार करून मगच ते तेथे वाचत असत. का? असल्या प्रसंगी प्रत्येक शब्द मोठ्या जबाबदारीचा असतो. प्रत्येक विधान अतिशय धोरणाने नि चतुराईने करायचे असते. राष्ट्राच्या हिताहिताचे संबंध सांभाळायचे असतात. तेव्हा प्रत्येक शब्द मोजका, नेमका आणि बिनचूक वापरण्याचीच खरी शहामत असल्यामुळे, तसली भाषणे `वाचणे` हेच अगत्याचे.
लोकसभासदांना भाषणे वाचनाचा प्रतिबंध
पंतप्रधान, मंत्री किंवा उपमंत्री ह्यांनी सरकारच्या वतीने जी भाषणे म्हणजे निवेदने (स्टेटमेण्टस्) करायची असतात, ती त्यांनी लोकसभेत `वाचली` तरी चालतील, नव्हे, ती वाचावीच लागतात. पण लोकसभेच्या सभासदांनी मात्र आपली भाषणे वाचता कामा नये, असा दण्डक दिल्लीच्या लोकसभेचे सभापती (स्पीकर) श्री. मावळकर यांनी दि. २-४-१९५५ रोजी पुकारला.
ती हकीकत अशी : सरदार अमरसिंग मंगल हे काँग्रेस खासदार आपले लिहून आणलेले भाषण वाचू लागले असता, लोकसभापती श्री. मवाळकर यांनी त्यांना प्रतिबंध केला. सभापती म्हणाले - "सभासदांनी भाषणे वाचनू दाखविण्याची पद्धत टाकणे योग्य हाईल. मुद्दे लिहून आणले असल्यास त्यावरून बोलावे, आपण येथे चर्चेसाठी जमतो. तेव्हा सभागृहाबाहेरून लिहून आणलेली भाषणे येथे वाचून दाखविणे अवास्तव ठरते. बाहेरून लिहून आणलेली भाषणे दुसऱ्याकडून लिहून घेतलेली असण्याचाही संभव असतो. मंत्री जेव्हा सरकारी धोरणाविषयक निवेदन करतात, तेव्हाची गोष्ट वेगळी. पण सभासदांना भाषणे वाचून दाखवता येणार नाहीत."
मार्कस क्विंटिलियनचा इशारा
तो म्हणतो, – “तुमची वाचनाची पद्धत विशेषतः मर्दानी ठेवा. त्यात भारदस्तपणा आणि गांभीर्य असलेच पाहिजे, पण काही प्रमाणात त्यात माधुर्यही असले पाहिजे. पद्याचे वाचन गद्याप्रमाणे करू नका. कारण पद्य हे काव्यात्मक असते आणि सुबुद्ध कवी म्हणतात, `ते गायले पाहिजे.` पद्याचे वाचन(म्हणजे गायन)सुद्धा गेंगाण्या स्वरात, गुणगुणण्याच्या आवाजाने किंवा अशास्त्रीय पद्धतीने करू नका किंवा ते गाताना अगदी बायकांसारखे `दळू बाई दळू`चा फाजील मृदुपणा आणू नका."
मार्कस क्विंटिलियन (ज. इ. स. ४५, मृ. ११८) हा एक नामांकित रोमन शिक्षक आणि टीकाकार होता. त्याने `इंस्टिट्यूशियो ओरॅटोरिया` नावाचा वक्तृत्वशास्त्राचा ग्रंथ लिहिला.
`बोलण्याचे` व्याख्यान `लिहावे` कसे?
व्याख्यानाकरिता म्हणजे बोलण्यासाठी निबंध लिहून काढताना, वरचेवर थांबून लिहिलेला मजकूर मोठ्याने वाचून पाहावा. म्हणजे तो आपल्या `तोंडी नीट बसेल` का नाही, तो `नीट बोलला` जाईल का नाही, हे तेव्हाच समजेल. लिहिलेल्या मजकुरातले शब्द `तोंडी नीट बसत नसतील` तर कोठे तरी दोष आहे आणि तो तेव्हाच्या तेव्हाच दुरूस्त केला पाहिजे. नाहीतर सगळा मजकूर `बोलायच्या योग्य होईतोवर` वरचेवर पुनःपुन्हा `लिहिला` पाहिजे.
उत्तम नाटककारांची नाटके वाचल्याने, बोलण्याची भाषा कशी लिहावी किंवा कशी तोंडवळणी पाडावी, हे छान शिकता येते. वर्तमानपत्राची प्रबंध भाषा आणि निरनिराळ्या स्वभावांच्या पात्रांच्या तोंडी कसलेल्या नाटककाराने योजलेली भाषा, ह्यात कितीतरी तफावत असते. शेक्सपियरच्या नाटकांची अनेक भाषांतरित नाटके मराठी रंगभूमीवर आलेली आहेत. हे भाषांतराचे किंवा अनुवादाचे काम वाटते तितके सोपे नाही. खरोखरच तेथे पाहिजे जातीचे प्रो. वासुदेवराव केळकर ह्यांनी `टेमिंग ऑप द श्रू`चा `त्राटिका` नाटकाने केलेला अनुवाद, अथवा `ऑथेल्लो`चा देवलांनी केलेला `झुंजारराव` अनुवाद पहा आणि आगरकरांनी `हॅम्लेट`चे केलेले `विकारविलसित` पहा, भाषाशैलीत जमीन आस्मानाचा फरक दिसून येईल. आगरकर केवळ निबंधकार. शेक्सपियरच्या इंग्रजीवरून शब्दाला शब्द ठेवून केलेले त्यांचे केवळ भाषा-अंतर `वाचण्यालायक` असले तरी `बोलण्यालायक` केव्हाही ठरले नाही. म्हणूनच त्यांचे `विकारविलसित` रंगभूमीवर कोणालाही रंगविता आलेच नाही.
वासुदेवराव केळकर आणि देवल जातिवंत नाटककार. नाट्य त्यांच्या रोमारोमात संचारलेले. म्हणून त्यांच्या नाटकातील बोल-भाषा श्रोत्यांच्या मनाचा तेव्हाच चिकटा धरते. गडकऱ्यांची नाटके साहित्य, कल्पनाविलास, शब्द-चमत्कार इत्यादी गुणांनी कितीही श्रीमंती असली, तरी त्यांच्या पात्रांची भाषा `बोलण्याची` नसते. पंडिताच्या पांडित्यप्रचुर प्रवचनासारखी असते. सर्वसामान्यांना ती समजत नाही. तसली भाषा व्यवहारात कोणी कधी बोलतच नाहीत.
`त्राटिका`, `झुंजारराव`सारखी नाटके अल्पसंख्य सुशिक्षितांच्या बरोबरीने जशी बहुसंख्य बहुजनसमाजाच्या रसिकतेला वेध लावतात, तसा परिणाम गडकऱ्यांच्या नाटकाने झाल्याचा दाखला नाही. त्यांची साहित्यश्रीमंती नाटके फक्त मूठभर पांढरपेशा शहरी सुशिक्षितांनाच आवडतात. बहुजनसमाजाला गडकऱ्यांचा कसलाही काही परिचय झालेला नाही.
लोकभाषेत लोकांच्या राष्ट्रीय मनोवृत्तीचे प्रतिबंब दिसले पाहिजे. रेव. डीन आल्फर्ड `भाषेचे राष्ट्रीय महत्त्व` वर्णन करताना सांगतात - "कोणत्याही लोकांची भाषा क्षुल्लक समजू नका. त्यांच्या राष्ट्रीय मनोवृत्तीचे प्रतिबिंब त्यांच्या भाषेत दिसत असते. विचार व्यक्त करणारी भाषा जर धरसोडीची, थातूरमातूर आणि कमकुवत असेल, तर त्या लोकांचे विचारही तितकेच धरसोडीचे आणि हीन दर्जाचे आहेत, असे समजावे. जर ती भाषा केवळ उंचउंच भराऱ्या मारणारी आणि अगडबंब (बोम्बॅस्टिक्) क्लिष्ट शब्दांचे अवडंबर माजवणारी असेल, तर राष्ट्रीय साधेपणा आणि सात्त्विकपणा ह्याची तळी लवकरच उचलली जाणार, असा कयास बिनचूक बांधावा."
तात्पर्य, व्याख्यानात बोलण्याची भाषा सालंकृता असो वा नसो, ती नीट बोलण्यासारखी असावी. पंडितांच्या सभेत वेदान्ती थाटाची शब्दावडंबरी भाषा कदाचित त्या मूठभर श्रोत्यांच्या वाखाणणीला पात्र ठरेल, पण तसल्या भाषेने सध्याच्या लोकशाही युगात बहुजनसमाजाची मने काबीज करता येणे शक्य नाही. साध्या सुटसुटीत बालबोध भाषेने, मानसशास्त्रासारख्या कठीण विषयावर, आपुलकीची भाषा लिहून ती तितक्याच आपुलकीने रेडिओवर वाचण्यात सोनूताई जोगळेकर आणि नमूताई समर्थ यांची पात्रता वाखाणण्यासारखी आहे. रेडिओवरील नाटकातील भाषणे साहजिकपणे बोलून भूमिका वठविण्यात मुंबईचे श्री. बाळ कुडतरकर आणि पुण्याचे गोपिनाथराव टिपणीस त्यांचा उल्लेख अगत्य करणे प्राप्त आहे.
काव्य-गायन का काव्य वाचन?
कविता गाव्या, का नुसत्या गद्यासारख्या वाचाव्या, हा अलीकडे नुसता वादाचाच नव्हे, तर एक बंडाचाच प्रश्न झाला आहे. मुक्तछंदाचा प्रकार काव्यक्षेत्रात आल्यापासून, कविसंमेलनातली काव्य-गायने धडधडीत गद्य-वाचने झाली आहेत. जाहीर व्यासपीठावरील अथवा रेडिओवरील कविसंमेलनांचे कार्यक्रम पाहताना नि ऐकताना, उगाच नमुन्याला एखाद दुसरी कविता कोणी कवीने गायली तर गायली, नाहीपेक्षा बहुतेक सारा कार्यक्रम सर्वसाधारण सभेसारखा गद्यातच होत असतो. आजकालच्या कविजनांना संगीताचे बरेच वावडे आहेसे दिसते.
पूर्वी संगीताची चाल घेऊन त्याप्रमाणे संगीत नाटकातील पदे कविजन रचीत असत. आता, कवीने मन मानेल तो मजकूर हव्या तितक्या छोट्या मोठ्या ओळींनी लिहायचा आणि त्याला संगीताचे सूर लावीत बसण्याची भाडोत्री उठाठेव संगीतज्ज्ञाने करायची, असला `आधी कळस मग पाया`चा खटाटोप चालू आहे.
मधाप्रमाणे काव्याचा अथवा कवितेचा गोडवा चाखण्याची रसिकांची एक रीत आहे. कवितेतली शब्दयोजना वाचताना जिव्हेला समाधान, शब्दोच्चारांच्या संगीताने कर्णेन्द्रियाला समाधान आणि अर्थाचा जसजसा बोध होत जाईल, उपमा अलंकार उत्प्रेक्षांचे सौंदर्य उमगत जाईल, तसतसे बुद्धीच्या इंद्रियाला म्हणजेच वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या रसग्रहणशक्तीला समाधान, असा त्रिवेणी संगम व्हावा लागतो. हा अनुभव घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी रघुनाथ पंडित ह्यांचे `नलोपाख्यान` मुद्दाम अभ्यासावे, अशी शिफारस आहे.
दिसायला गद्य पण त्यातच पद्य
काव्य म्हणजे अर्थवाही गद्य, त्यात संगीताची लुडबुड कशाला? असा मुक्तछंदी छांदिष्टांचा हेका अथवा खाक्या दिसतो. लिहायचे गद्य पण त्यातच गुप्त असायचे पद्य, हा एक ११६ वर्षांपूर्वीचा मऱ्हाठी कलमबहाद्दरांच्या लेखनशैलीचा नमुना त्यांनी अगत्य पहावा, म्हणून येथेच दाखवतो.
इ. स. १९५३ साली मुनशी गणपतराव या उद्योगी साहित्यिकाने हेमाद्री कृत `लेखन-कल्पतरू` नावाचा एक ग्रंथ मूळ प्रतीवरून तपासून मुंबईला प्रसिद्ध केला होता. `महाराष्ट्र देशातील आपले वडिलोपार्जित जे लेखन चालत आले आहे, त्याची रीती पुरातन स्वदेशी कवींनी काय योजली व सप्रमाण लेखन कोणते, हे कळले पाहिजे म्हणून हा ग्रंथ प्रसिद्ध केला जात आहे,` असे त्यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे. ह्या ग्रंथाच्या तिसऱ्या भागात सरळ गद्यात लिहिलेला मजकूर, योग्य ठिकाणी `यति` दिला असता किंवा भाग पाडले असता, तोच मजकूर श्लोक, अभंग, आर्या किंवा गीती वृत्तांमध्ये कसा सहज वाचता येतो, ह्याची उदाहरणे दिली आहेत.
नमुना १ ला
विनंती विशेष. आपणाकारणे पक्व आंबे दाणे एक शत चांगल्या झाडांचे बहु नामांकित गोडीस बहुत योग्य, ऐसे आणोनिया सारे बहुत योग्य, ऐसे आजोनिया सारे बहुत माफजाती करून, गड्याहाती पाठविले आहेत. हे घ्यावे व उत्तर द्यावे. बहुत काय लिहावे हे विनंती.
साधी पत्राची चिठ्ठी आहे ना ही? भाषा अर्थात जुनी आहे. आता ह्याच गद्य पत्राचा अभंग कसा होतो ते पहा -
विनंती विशेष । आपणांकारणे । पक्व आंबे दाणे । एक शत ।।१।।
चांगल्या झाडांचे । बहु नामांकित । गोडीस बहूत । योग्य ऐसे ।। २ ।।
आणोनिया सारे ।, बहुत माफजाती । करून गड्याहाती । पाठविले ।।३।।
आहेत हे घ्यावे । व उत्तर द्यावे। बहुत काय लिहावे । हे विनंती ।।४।।
नमुना २ रा
विज्ञापना अशी की, राजश्री देवराव दादांनी मजला विनंती केली की आमुच्या सर्व भाऊबंधांनी दीक्षित यांचा आश्रय करूनी समाईक इनाम जे आहे ते पितृसंपादित, तेव्हा भागिले असावे, हे विहित असून, विभाग न देता, उत्पन्न तेच घेतात, यास्तव आलो आहोत. त्यास कृपा करून त्या इनामात आम्हास भाग येईल असे दीक्षित यांस स्नेहतकीचे एक पत्र द्यावे. याकरिता लेखनात येते की, देवराव यांनी जो मजकूर कळविला आहे तो जर खरा आहे तर स्नेहाला योग्य ते करालच. हे आपण करावे, म्हणोन लिहिणे नको. कृपाव्याप्ती प्रतिदिनी विशेष व्हावी, एवं श्रुत होय, हीच विज्ञाप्ती.
नव्या पालवीच्या मऱ्हाठी साहित्यिकांना पत्रलेखनाची ही जुनी शब्दयोजनेची पद्धत मनोरंजक जरी खास वाटेल. हे पत्रही शुद्ध गद्यातच आहे. आता ते आर्यावृत्तात कसे वाचता येते पहा –
विज्ञापना अशी की, राजश्री देवराव दादांनी
मजला विनंती केली की आमुच्या सर्व भाऊबंधांनी १
दीक्षित यांचा आश्रय करूनी समाईक इनाम जे आहे
ते पितृसंपादित तेव्हा भागिले असावे हे २
विहित असून विभाग न देता उत्पन्न तेच घेतात
यास्तव आलो आहो त्यास कृपा करूनी त्या इनामात ३
आम्हास भाग येईल असे दीक्षित यांस स्नेहतकीचे
एक पात्र द्यावे याकरिता लेखनात येते की ४
देवराव यांनी जो मजकूर कळविला आहे
तो जर खरा आहे तर स्नेहाला योग्य ते करालच हे ५
आपण करावे म्हणोन लिहिणे नको कृपा व्याप्ती
प्रतिदिनी विशेष व्हावी एवं श्रुत होय, हीच विज्ञाप्ती ६
नमुना ३ रा
बहुत दिवस झाले पत्रिका येत नाही म्हणुनि सतत माझे चित्त चिंताप्रवाही पडत असून त्याचे हेतुचा मी विचार अनुदिन करित आहे. यामुळे हा प्रकार त्यजून अतिकृपेने पत्रिका येत जावी व परम ममतेची वृद्धि होण्यात यावी.
वृत्त मालिनी
बहुत दिवस झाले पत्रिका येत नाही
म्हणुनि सतत माझे चित्त चिंताप्रवाही
पडत असुन याच हेतुचा मी विचार
अनुदित करित आहे. यामुळे हा प्रकार
त्यजुनि अतिकृपेने पत्रिका येत जावी
व परम ममतेची वृद्धि होण्यात यावी.
प्रकरण ७
पाठांतर
वाचनाप्रमाणेच पाठांतर हा विषय शालेय शिक्षणक्रमातून अलीकडे वगळल्यामुळे, स्मृतिविकसनाच्या कामी फार मोठा अडथळा तर निर्माण झालाच आहे, पण अष्टपैलू वक्तृत्व-साधनाचे एक साधनच दुरावले आहे. संभाषणात काय किंवा भाषणात काय, आपल्या विधानांच्या बळकटीसाठी थोर तत्त्वज्ञांचे सिद्धांत, संस्कृत मराठी किंवा इंग्रजी सुभाषिते अथवा तुकाराम, रामदास, वामन, मोरोपंतादि कवींच्या काव्यातील भाग समयोचित वापरणे अवश्य असते. मोठमोठ्या तत्त्ववेत्त्यांचे प्रभावशाली सिद्धांतपूर्ण विचार हक्काच्या इस्टेटीसारखे आपलेच असतात. व्यक्ती दिवंगत झाली तरी तिचे विचार अमर असतात.
डॉ. मॅके (लोकप्रिय स्कॉच कवी) `विचारांचे अमरत्व` या मुद्द्यावर लिहिताना म्हणतो - "जुने विचार कधीही मरत नाहीत. अजरामर तत्त्वसूचक स्वप्ने पाहणाऱ्यांच्यापेक्षा ती स्वप्नेच चिरंजीव असतात आणि त्यांच्यावर आपणा सर्वांचा वारसा हक्क असतो. एकदा विचाराला आकार आला नि त्याचा उच्चार झाला का तो कधी नष्ट होणेच शक्य नाही. त्या अमर विचारांच्या खजिन्यासाठी आपल्याला अखंड ग्रंथावलोकन केले पाहिजे. ग्रंथ हेच उच्च दर्जाचे सद्गृहस्थ होत. भविष्य काळाच्या कानात सद्विचारांचे निरोप मोठ्या आवाजात हेच सांगत असतात."
ग्रंथांची निवड
`टाईम्स ऑफ इंडिया` हातात घेतल्यावर, वाचक कोणते पान प्रथम उघडतो ते पाहून, तो कोण आहे, त्याला काय पाहिजे, त्याचा व्यवसाय काय, हे बहुतांशी बिनचूक सांगता येते. व्यापारी असतो, तो आधी व्यापाराचे पान पाहतो. भाव वधारले किती नि घटले किती याची त्याला विवंचना असते. `वॉण्टेड कॉलम` चाचपणारा बेकार असतो. एकही पान न उलटता पहिल्याच पानावर ज्याची नजर भिरभिरू लागते, तो जागतिक बातम्यांचा अभ्यासू, म्हणजे मुत्सद्दी, राजकारणी अथवा वृत्तपत्री साहित्यिक असतो. याच नियमाने कोणाच्याही हातातल्या पुस्तकावरून स्वारी कोणत्या विषयाची शौकिन आहे, हे ताडणे फारसे कठीण जात नाही.
ग्रंथालयातून ज्या विषयांच्या पुस्तकांना मागणी फार, त्यांच्या उच्च मध्यम क्षुद्रपणावरून त्या परिसरातील लोकांच्या विचारांचा कस सकस का हिणकस हे तेव्हाच समजते. अध्यासनीय पुस्तकांची निवड हा खरोखर फार मोठा विवेकाचा प्रश्न आहे. मित्रांची निवड करताना जितकी दक्षता ठेवावी लागते, तितकीच किंबहुना विशेष दक्षता ग्रंथनिवडीच्या कामी राखली पाहिजे. ग्रंथ आपले जीवश्चकंठश्च मित्र आहेत. आपल्या लहरीप्रमाणे केव्हाही त्यांना `हाती धरता येते` किंवा `स्वस्थ बसा` म्हणून सांगितले तरी त्यांना राग येत नाही. पुन्हा उचलले तरी सेवेत रेसभर अंतर पडायचे नाही.
ज्या पुस्तकांच्या वाचनाने वाचकांची मनोवृत्ती उन्नत होत नाही, त्यांच्या ज्ञानाला अभिनव चेतनेची आच लागत नाही आणि ज्यांच्या स्वाध्यायाने त्याला नीच अवस्थेतून उच्च स्थितीत भरारी मारण्याचे सामर्थ्य प्राप्त होत नाही, असली भिकार पुस्तके वाचून वेळेचा नि शक्तीचा अपव्यय मनुष्याने का करावा?
रेवरंड डॉ. चॅनिंग (ज. १७८०, मृ. १८४२, जागतिक शांति नि स्वातंत्र्यावर बोलणारे महान वक्ते) ग्रंथमाहात्म्यावर असे प्रवचन करतात :
"उन्नत मनोवृत्तीशी नित्य सांनिध्यसुखाचा आपल्याला जो घडतो, त्याचे सारे श्रेय मुख्यत्वेकरून ग्रंथांना आहे आणि ही बहुमोल संदेशाची जंत्री प्रत्येकाच्या अगदी हातची आहे. उत्कृष्ट ग्रंथातून थोर लोक आपल्याशी प्रत्यक्ष बोलतात; आपल्या मौल्यवान विचारांचे आपल्याला ते दान देतात; आपले सर्व आत्मतेज आपल्या आत्म्यात ओतून त्याला तजेला आणतात. ग्रंथ हे कालपटलाच्या आड झालेल्या दूरस्थांचे ध्वनी होत. गतकालातील आध्यात्मिक चारित्र्याचे आपण वारसदार आहोत, असे हे ध्वनी आपणास इतक्या लांबून जाहीर करीत असतात.
ग्रंथ हेच खरे गुरू होत. जे त्यांची नीट जोपासूना करतील, त्यांचा उपदेश मानतील, त्या सर्वांना आपल्या पूर्वजांच्या श्रेष्ठ नि उत्कृष्ट अशा सामाजिक नि धार्मिक ज्ञानाची ते जोड करून देतात. मी कितीही दरिद्री असलो तरी हरकत नाही. माझ्या अज्ञात झोपडीत भरभराटीचे पाऊल पडले नाही तरी पर्वा नाही. परंतु पावनतम विषय लिहिणारे पवित्र ग्रंथकार जर माझ्या झोपडीतल्या पुस्तकांच्या फळ्यांवर येऊन आपली चरणधूळ झाडतील आणि तेथे कायमचे वास्तव्य करतील; नंदनवनातील (पॅराडाइज) मधुर स्वराची अमृतमय गाणी मला ऐकवण्याला मिल्टन जर माझ्या झोपडीचा उंबरठा ओलांडून आत येईल; उच्चतम कल्पनांची कपाटे आणि मानवी अंतःकरणातील नानाविध कारस्थानांच्या पेट्या शेक्सपियर जर मला उघडून दाखवील आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या ज्ञानसंचयाने मला समृद्ध नि श्रीमंत करायला जर फ्रांकलिन कंबर बांधून तयार असेल, तर यापेक्षा बुद्धिवंतांच्या संगतीची मला मुळीच इच्छा नाही नि तिच्यासाठी मी मुळीच हळहळणार नाही आणि माझी पक्की खात्री आहे की, हल्ली समाजोन्नती समाजोन्नती म्हणून जी बोंबाबोंब चाललेली आहे, तिच्यापासून अलिप्त राहूनसुद्धा मी पक्का परिणत संस्कृत आणि प्रबुद्ध बनू शकेन."
पाठांतराने स्मरणशक्ती वाढते
स्मरणशक्तीत कच्चा, तो सगळ्याच बाबतीत कच्चा. व्याख्यानात तर पदोपदी नि शब्दोशब्दी स्मरणांची आवश्यकता फार असते. वेळेवर काही आठवले नाही का वक्ता गळाठलाच. `श्रवण, मनन, निदिध्यास` ही स्वाध्यायाची तीन महत्त्वाची गमके आहेत. श्रवणाची जागा आता वाचनाने घेतली आहे. तरीसुद्धा रेडिओ अवतरल्यामुळे श्रवणाची एक नवीन सोय झालेली आहे.
आपण जे जे वाचतो किंवा पाहतो, त्याचे स्वच्छ प्रतिबिंब आणि कल्पना आपल्या हृदयपटावर उमटल्या पाहिजेत. वाचनाचा विषय आवडीला असला म्हणजे त्यातील कल्पनांशी तादात्म्य राखता येते. वाक्यातील उत्कृष्ट गद्यपद्यात्मक भाग, सुभाषिते, चुटके, विनोद वरचेवर वाचून वाचून पाठ करीत गेल्याने स्मृतिविकसनाचे काम उत्तम होत जाते. ह्या पाठांतरातही तादात्म्यता हवीच हवी.
नामदार गोखले ह्यांनी मेकॉलेच्या ग्रंथाचे परिशीलन असेच अगदी तन्मयतेने केल्यामुळेच त्यांच्या इंग्रजी भाषेतल्या अस्खलित वक्तृत्वाने खुद्द इंग्लंडनिवासी इंग्रज गृहस्थ आणि स्त्रिया चकित झाल्या. लंडन येथे गोखल्यांचे पहिलेच जाहीर व्याख्यान झाल्याचे दुसरे दिवशी `लंडन टाइम्स`ने अग्रलेख लिहून "आमची मातृभाषा इंग्लिश ठसकेबाज, स्वच्छ नि स्पष्ट उच्चारांनी बोलावी कशी, हे आम्हाला ह्या भारतीय वक्त्याने आज शिकविले." असा स्तुतिपाठ गायला. विधानांच्या पुष्टीसाठी मोठमोठ्या प्राचीन इंग्रजी ग्रंथकारांच्या ग्रंथातले, ब्रिटिश लोकसभेच्या इतिवृत्तातील उतारे नाम. गोखले भराभर तोंडपाठ बोलताना पाहून, इंग्लिश जनता नि मुत्सद्दी चकित होत असत. लो. टिळकांच्या भाषणात संस्कृत सुभाषितांचा भरणा मुबलक असायचा.
प्रसंगी ते हितोपदेश अथवा पंचतंत्रातील एखादी गोष्ट सांगून प्रतिस्पर्ध्यांची जेव्हा हुरेंवडी उडवायचे, तेव्हा तर काय, सारी सभा नुसती हादरायची. `काळ`कर्ते शिवरामपंत परांजपे तर्कशास्त्रात पटाईत. त्यांच्या लेखन व्याख्यानात व्याजोक्ती, व्यंगोक्ती, वक्रोक्ती नि उपहासाची जी शब्दचित्रे आढळत असत, तो सारा त्यांच्या तार्किक विलासाचा परिणाम असे. जुन्या ग्रंथकारांचे पुरावे भराभर देण्यात परांजपे फार निष्णात असत. सयाजीराव गायकवाड हे राजेच असल्यामुळे, जाहीर व्याख्यानांचे प्रसंग फार थोडे यायचे. पण जे काही थोडे यायचे, त्यातही जागोजाग समर्पक उत्तम उतारे देण्याची त्यांची हातोटी वाखाणण्यासारखीच असे.
जुन्या जमान्यातल्या या थोर पुरुषांना शालेय प्राथमिक शिक्षणापासूनच पाठांतराचा विषय आवश्यक असल्यामुळे, पुढच्या विद्याजर्नात आणि सार्वजनिक कार्याच्या दलामलीत, विधानांच्या समयोचित पुरस्कारासाठी पुरावे, उतारे, सुभाषिते आणि उक्ती यांचा भरपूर पुरवठा करण्यासाठी त्यांची स्मरणशक्ती हजरजबाबी तयार नि तल्लख असे. आज-कालच्या विद्वानांना `बेस्ट कोटेशन्स`ची पुस्तके चाळून घोळून कामचलाऊ गाडे रेटावे लागते.
व्याख्यानात अवतरणे असावी का नसावी?
विद्वज्जनांच्या अथवा विचारमंथन करण्यासाठी जमलेल्या एखाद्या संस्थेच्या छोटेखानी कार्यकारी मंडळात, `१९०८ साली लो. टिळक असे म्हणाले आणि १९४७ साली गांधी तसे म्हणाले`, असल्या अवतरणांचा उपयोग थोडाफार झाला तर होतो. पण अवतरणांची संदर्भ पुस्तके लिहिणारांचा हेतू इतका तो खास होत नाही. एखाद्या प्रतिस्पर्ध्याचे असंबद्ध विधान खोडून टाकण्यासाठी चुरचुरीत अवतरणाचा उपयोग करावा लागला तर खुशाल करावा. पण काही वेळा असे प्रतिस्पर्धी भेटतात की त्या मात्रेचा त्यांच्यावर काहीच परिणाम घटत नाही. कारण, असेही काही असंबद्धतेचे हरीचे लाल, विशेषतः राजकारणाच्या क्षेत्रात भेटतात, का अवतरणेचशी काय, पण त्यांच्या पदरात त्यांच्या असंबद्धतेचे माप घालण्यासाठी शाब्दिक शालजोडीचाही उपयोग फोल ठरतो. व्याख्यानात अवतरणे असलीच पाहिजेत, असा काही सर्वसामान्य सिद्धांत मांडता यायचा नाही. निबंधलेखनात मात्र अवतरणे शोभतात.
भाषणे पाठ करावी काय?
व्याख्यान देण्याच्या क्षेत्रात नवीनच पाऊल टाकणारांनी, प्रथम आपली भाषणे नीट लिहून काढावी, त्यातली भाषा सोपी बालबोध असावी. ती खूप वेळा "बोलल्यासारखी वाचावी", पण ती तोंडपाठ करून सभेत बोलावी काय? विद्यार्थी मंडळींनी प्राथमिक यत्नासाठी लहानसहान म्हणजे १५-२० मिनिटांच्या भाषणाबाबत असला प्रयोग करू नये. स्मरणशक्ती मोठी दगाबाज असते. केव्हा दगा देईल, त्याचा नेम नसतो. शिवाय, भाषण करताना, आपले सारे लक्ष विषयाच्या महत्त्वावर ठरत नाही. त्यातल्या विचारांप्रमाणे शब्दोच्चारात आणि चेहऱ्यावर विकार उमटत नाहीत. पाठांतर केलेली वाक्ये एकामागून एक बिनचूक येत आहेत का नाहीत, इकडेच भाषकाची विवंचना लागलेली असल्यामुळे, एक वाक्य संपल्यानंतर दुसरे आठवले नाही का आटोपलाच सारा कारभार. कित्येक केवळ पाठांतऱ्या वक्त्यांची स्मरणशक्ती, ते व्यासपीठावर येऊन सभावलोकन करू लागताच, दगा देऊन पसार होते. पहिले वाक्यही त्यांना आठवत नाही. ते आठवल्याशिवाय त्यांची गाडीच चालू होत नाही आणि यदाकदाचित झालीच, तर "छे बुवा, माझी आठवण आणखी किती दगा देणार आहे, कोण जाणे" या भीतीने तो आरपार लंजूरच होतो. याचे एक मजेदार उदाहरण लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रात (भाग २, पान ८८-९०) त्यांनी फार छान रंगवलेले आहे.
एक मनोरंजक गोष्ट
महाराष्ट्राचे आद्य बालकवी (म्हणजे फुलामुलांचे कवी) नारायण वामन टिळक यांच्या लक्ष्मीबाई पत्नीने ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतल्यानंतर काही दिवसांनी नगर येथे भरणाऱ्या ख्रिस्ती जनांच्या वार्षिक ऐक्यसभेत त्यांनी भाषण करावे, असे टिळकांनी ठरविले. त्या सभेला नगर, सातारा, सोलापूर वगैरे अनेक जिल्ह्यांतून हजारो क्रिस्तीजन जमत असत. एक मोठी यात्राच भरायची ती.
"त्या दिवशी तर अगदी दारा-खिडक्यांतूनही लोक होते. टिळकांची बायको बोलणार म्हणून ज्याला त्याला कुतूहल वाटत होते. टिळकांना फार हौस की आपल्या बायकोने कोणीतरी मोठ्ठे व्हावे. लेखिका, कवयित्री, वक्ती तिने बनावे व ह्या दिशेने ते नेहमी प्रयत्न करीत असत. - पण वक्ती बनण्याचा माझ्यावर हा पहिलाच प्रसंग होता. ज्या बाईने दिवा लाविला नाही ती आवा पाहण्यास जाणार, - मला टिळकांनी भाषण लिहून दिले होते. कितीतरी वेळा त्याची संथा दिली. रानात दोघांनीच जाऊन मी त्यांच्यापुढे ते मोठ्या स्वरात पाठ म्हणून दाखविले होते. अशा रीतीने तयारी तर अगदी अवाढव्य झाली होती. प्रत्येक वक्त्याला दहा मिनिटे देण्यात आली होती. माझ्या आधी दोन-चार भाषणे झाली. माझे नाव निघताच मीही पुलपिटवर मोठ्या ऐटीने जाऊन उभी राहिले.
पुढे लोकांचा अफाट जनसमुदाय पसरला होता. अगदी पुढे पहिल्याच बाकावर डॉ. ह्यूम व टिळक बसले होते. माझा पोषाक अगदी होता तोच होता. म्हणजे नथ, बुगड्या, कुंकू, कासोट्याचे लुगडे असा थाट होता. ख्रिस्ती लोकांत स्त्रियांचा पोषाक ठरून गेलेला आहे. तेव्हा त्यांच्या डोळ्यांना हे एक निराळेच दृश्य होते. तशात मी नुकतीच ख्रिस्ती झालेली.
"मी मोठ्या ऐटीने पुलपिटवर जाऊन उभी राहिले खरी, पण दहा मिनिटांतील नऊ मिनिटे माझ्या तोंडातून एक शब्द उमटे ना. एखाद्या ओंडक्याप्रमाणे मी उभी होते व एखाद्या चित्राप्रमाणे श्रोतृसमूह बसला होता. माझ्यासाठी कित्येकजण प्रार्थना करीत होते की देवा, हिच्या तोंडून चार शब्द तरी निघू देत. कोणी पाण्याचा पेला आणून ठेविला, कोणी लवंगा आणून ठेविल्या. पण मला मुळी कोरड पडली नव्हती तर मी त्यांचा उपयोग तरी कसा काय करणार? कोणी मनात म्हणत, `हिच्या हातात कागद होता. पण तोही तोंडाकडे जाई ना.
रुमालाची सवय नाही व कागद वाचण्याची आठवण नाही. तेव्हा डॉ. ह्यूम माझे आभार मानण्यासाठी उठले. इतक्यात मला वाचा फुटली व मी इतकी धडाधड व अस्खलित बोलू लागले की माझे भाषण ऐकून सर्व लोक चकित झाले. भाषण संपले. पण माझे मन म्हणजे काहीतरी चुकून राहिले. कागदावर डाग पडला होता तेथले भाषण राहिल्यासारखे वाटते. शेवटी पाठ केल्याच्या बाहेरचे मी बोलले. मोठे प्रसंगावधान राखले. मी म्हणाले – ``मला जे सांगायचे होते ते मी सांगून टाकले. आता ह्यातील जे काही सांगायचे राहिले असेल ते आपले प्रिय मिस्टर टिळक सांगतील.``
"आमचा भ्रमाचा भोपळा फुटला. मी जागेवर येऊन बसले. माझ्या जागी पुलपिटवर टिळक दिसू लागले. ते म्हणाले - "मला सांगायचे हिने काहीच ठेवले नाही." घरी आल्यावर मी त्यांच्यावर फार रागवले. ते म्हणाले, ``पाण्यात उडी टाकल्यावाचून पोहता येत नाही.`` मी त्यांना सांगितले, ``इतःपर मी कोठेही बोलावे असे तुम्हाला वाटत असेल तर मी पाठ करून बोलणार नाही. मला माझ्या मनाला वाटेल तसे बोलेन. दुसऱ्याच्या लिहिण्याने माझ्या मनाचा गोंधळ होतो. त्यानंतर आतापर्यंत मी पुष्कळ वेळेला सभांमधून भाषणे केली, पण कची लिहून पाठ करून केली नाहीत."
सभाजनांची जबाबदारी
नवशिक्या वक्त्यावर असे प्रसंग हमखास येतात. त्यावेळी सभाजनांनीही एक नाजूक जबाबदारी पाळावी लागते. त्यांनी हुरेंवडी केली तर एक नवोदित वक्ता खरोखरच व्याख्यानक्षेत्राला कायमचा मुकण्याचा संभव असतो, या मुद्द्याविषयी लक्ष्मीबाई म्हणतात - "मला सभाधीट जर कोणी केले असेल तर ते ख्रिस्ती श्रोत्यांनी. त्या दिवशी माझ्या पहिल्या भाषणात नऊ मिनिटे हा एवढा मोठा समाज जो इतका शांतपणे बसला, त्यानेच माझी भीड चेपली. या समाजातील श्रोत्यांची सभेतील वागण्याची शिस्त कमालीची सहानुभूतीची व शांततेची असते."
सभेतील शिस्तीचा हा अनुभव ख्रिस्ती समाजाचे एक भूषणच समजले पाहिजे. रविवार, ता. ६ मार्च १९५५ रोजी दादर शिवाजी पार्क मैदानात २ लाख ख्रिस्तीजनांची एक विराट सभा भरली होती. तेथेही त्यांनी दाखविलेली शांतता आणि शिस्त अत्यंत वाखाणण्यासारखी होती. एवढा मोठा समाज जमला होता, पण ना गोंगाट ना आरडाओरडा. सगळे कसे शांत शांत.
नाटकांचे प्रयोग करताना त्यातील भाषणे तोंडपाठच करावी लागतात. पात्रांची निवड झाली म्हणजे प्रत्येकाला त्याच्या नकला पाठ करायला देण्याची सर्रास पद्धत आहे. ती घातुक आहे, असा इशारा येथेच दिलेला बरा. तालमी देताना लेखकाने अथवा तालीम मास्तराने पात्रांना प्रत्येकाच्या भूमिका नीट समजावून देऊन, आपापली भाषणे आवाज, आरोहावरोह, कटाक्ष, विरामांसह कशी वाचावी, याची आधी तालीम दिल्याशिवाय पात्रांना नकला देत जाऊ नये. एकदा का स्वतःच्या समजुतीने पात्रांनी भाषणे पाठ केली, म्हणजे मग त्यांच्या तोंडात बसलेले सूर, भाषापद्धती, आरोहावरोह वबदलणे फार कठीण जाते. नाटकाचा व्यवसाय करणारांना मुद्दाम मी ही अनुभविक सूचना देत आहे.
नाटकातली भाषणे कशी म्हणावी, या विषयी शेक्सपियरच्या हॅम्लेट नाटकातल्या हॅम्लेटच्या सूचना, प्रि. आगरकरांच्या `विकारविलसित` नाटकातून येथे देत आहे, तिकडे जिज्ञासूंचे लक्ष असावे.
प्रि. आगरकर कृत `विकारविलसित` नाटक अंक ३, प्रवेश २ मधील चंद्रसेन आणि नाटकवाला यांची भाषणे :
चंद्रसेन : मी तुला सांगितले आहे त्याप्रमाणे हुबेहुब ते उठवून दे. बाकीच्या नाटकवाल्यांप्रमाणे हवा तसा ओरडत सुटू नको. कारण तसे करणे मला पसंत पडते तर ते तुझ्याकडे न देता गावच्या दवंडीवाल्याकडे दिले असते. दुसरे हे ध्यानात ठेव की, प्रसंगविशेषी मात्र हात हालवायचे; नाहीतर आपले एकसारखे पट्ट्याचे हात करीत बसशील. कारण मनोवृत्ती कितीही उच्छृंखल झाल्या असल्या तरी बोलण्यात नेमस्तपणा ठेवला म्हणजे भाषण चित्तवेधक होते.
पुष्कळदा कर्कश पोरे `क्यॅऽ` करून जेव्हा ओरडतात, तेव्हा माझी पायाची आग मस्तकात चढते. असल्या मूर्खपणाने रस उत्पन्न न होता भाषणाच्या चिंधड्या न चिंधड्या होतात व रंगभूमीजवळ बसणारांच्या कानटळ्या बसतात. असल्या गद्ध्याच्या पाठीचे चाबकाने धिरडे करून टाकावेसे मला वाटते. या राजश्रीने एकदा तोंड उघडले की याच्यापुढे कैदाष्णीचेसुद्धा तोंड बंद.
नाटकवाला : महाराज, माझ्या हातून असे व्हायचे नाही हे खात्रीने सांगतो.
चंद्रसेन : त्राटिकेचा सूर काढू नको असे म्हटले म्हणून आपला तोंडातल्या तोंडात मुळमुळ करीत बसशील. पण तेही उपयोगाचे नाही. ह्या कामात ज्याची त्याने अक्कल खर्चिली पाहिजे. पढवून किती येणार आहे? भाषण आणि अभिनय ही एकमेकांना जुळून चालली पाहिजेत. फाजीलपणा बिलकूल कामाचा नाही. कारण नाटक म्हणजे काय, तर स्वभावाचे यथोचित अनुकरण. म्हणून त्यात का एखादी वाजवीपेक्षा फाजील गोष्ट झाली, म्हणजे त्याचा तेव्हाच बेरंग होऊन जातो. सात्त्विकपणाची मुद्रा निराळी, तिरस्काराची मुद्रा निराळी.
तात्पर्य काय, की रस आणि समय यांच्या अनुसंधानाने अभिनय झाला पाहिजे. त्याचा अतिक्रम झाला किंवा हा कमी पडला म्हणजे अज्ञ लोकांना मात्र हसू येते. पण सहृदय प्रेक्षकांना पराकाष्ठेचा खेद होतो. हजारो अरसिक प्रेक्षकांनी टाळी दिली, पण अशांपैकी एकाने जरी नाक मुरडले, तरी सर्व खेळावर पाणी पडले असे तुम्ही मानिले पाहिजे. माझ्या पाहण्यात असे कित्येक नाटकवाले आहेत की, ज्यांची अरसिक व मूर्ख लोक पराकाष्ठेची वाखाणणी करीत असतात. पण त्यांच्यात गुण म्हणाल तर काडीचादेखील नसतो. बोलणे काय, गाणे काय, पोषाख काय, त्यांचे सगळे बकासुरी काम. असल्या नाटक्यांना कोपरापासून नमस्कार असो. हे बेटे मनुष्यस्वभावाची इतकी खराब बतावणी करतात की, त्यामुळे मला कधी कधी वाटते की, या लोकांना आमच्या नेहमीच्या ब्रह्मदेवाने घडविलेले नसावे, तर त्यांच्या करिता कोणीतरी भाडोत्री ब्रह्मदेव धरून आणिला असावा.
नाटकवाला : आम्ही त्या बाबतीत आमच्याकडून पुष्कळ सुधारणा केली आहे, महाराज.
चंद्रसेन : नुस्ती सुधारणा काय उपयोगी? तसल्या प्रकारची चुकी न् चुकी काढून टाकली पाहिजे. तुमच्यात जो विदूषकाचे सोंग घेणारा असेल त्याने जेवढे पुस्तकात लिहिले असेल तेवढेच बोलावे. नाहीतर काहीकाही असे फाजील विदूषक असतात की, दुसऱ्यास हसविण्यासाठी ते आपले दात अगोदर विचकतात. त्यांनी बत्तिशी काढून लोकांना खो खो करायला लावले म्हणजे बाकीच्या पात्रांचे श्रम फुकट जाऊन श्रोत्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो व खेळाचा फजिता उडून जातो. यासाठी ग्रंथकाराकडे लक्ष न देता जे कोणी अद्वातद्वा भाषण करतात, ते मोठे वाईट काम करतात. असे करण्यात त्यांना मोठी शेखी वाटते, पण त्यात फार नुकसान आहे.
प्रकरण ८
शब्दांचे सामर्थ्य
तद्वक्ता सदासि ब्रवीतु वचनं यच्छृण्वतां चेतसः
प्रोल्लासं रसपूरणं श्रवणयोरक्ष्णोर्विकासश्रियम्
क्षुन्निद्राश्रमदुःखकालगतिहत् कार्यान्तरप्रस्मृतिं
प्रोत्कण्ठामनिशं श्रुतौ वितनुते शोकं विरामादपि
भावार्थ : सभेत उभे राहून वक्त्याने बोलणे तर असे बोलावे की, ते ऐकताना श्रोत्यांची अत:करणे प्रसन्न व्हावी, कर्ण वाग्रसाने भरून जावे आणि डोळे आश्चर्याने विकास पावावे, तसेच क्षुधा, निद्रा, श्रम, दुःख आणि कलगती यांचे भान राहू नये, इतर सर्व कार्याचे विस्मरण पडून भाषण ऐकण्याकडेच त्यास अतिशय उत्कंठा वाटावी, आणि ते संपले असता फार वाईट वाटावे.
उत्तम वक्तृत्वाचा वर्णिलेला हा प्रभाव शब्दशक्ती घडवून आणते. अर्थात शब्दात काहीतरी विलक्षण शक्ती असली पाहिजे. नव्हे, शब्दशक्ती ही एक स्वतंत्र शक्तीच आहे. कितीतरी विद्वान आणि महापंडित आढळतात, ज्ञानाचे महासागर असतात, पण त्यांना शब्दशक्ती नसल्यामुळे, लोकांत त्यांच्या ज्ञानाचा प्रभाव पडत नाही. शब्दशक्तीशिवाय साऱ्या शक्ती फोल ठरतात.
शब्द! शब्द! शब्द!!! मानवी जीवनाच्या व्यावहारिक योजनांत शब्दांना खरोखरच काही स्थान आहे का? होय म्हणावे तर आहे, नाही म्हणावे तर नाही. म्हणजे विरोधाभासच हा. पण वस्तुस्थिती काय आहे? आजकाल आपल्या जीवनाचा कोणताही प्रश्न घ्या, योजावे एक आणि होते भलतेच, असे चालले आहे. कारण काय? लोकांच्या मतमतांतराची घडण घडविणाऱ्या आणि त्यांच्या आचारविचारांचे मार्गदर्शन करणाऱ्या नेत्या पुढाऱ्यांना, चालू घडीचे लोकजीवनाचे प्रश्न सोडविताना, आपल्या तोंडातून काय शब्द बाहेर पडतात, त्यांच्या बऱ्यावाईट परिणामांची जबाबदारी फारशी वाटत नाहीसे दिसते.
काळ्याकुट्ट अज्ञानयुगापासून आजच्या ज्ञानविज्ञान युगापर्यंत मानवाने जी मजल मारली आहे, तीत विचार व्यक्त करण्याची सोय ही एक अपूर्व कला साध्य केली आहे. जवळ शब्दभांडार मुबलक असले का हवे ते विचार हवे तसे हवेत भिरकावता येतात. म्हणजे, ही कला वाचाळपंचविशीइतकीच भयंकर ठरली आहे. जगाला भेडसावणाऱ्या बऱ्याचशा कुचाळ्या नि भानगडी शब्दांतून पैदा होतात. शब्दांनी माणसे जशी जोडता येतात, तशी तोडताही येतात. शब्दांना पंख असतात. आमच्या तोंड-पिंजऱ्याचे दार उघडायची खोटी का गेलेच ते भुर्रदिशी उडून बाहेर. एकदा निसटले का आमच्या आटोक्याबाहेर पार पसार. जान जान पछाडली तरी परत हाती लागायचे नाहीत.
वीज जशी थांबवता येत नाही, तसे शब्दांनाही थोपवता येत नाही. त्यांची शहामत तरी किती पहा. केसाएवढ्या चिरीतून ते सफाईत पार जातात आणि जाडजूड तटबंधाही कडाड फोडतात. प्रकाशाच्या व्यापाला जसा धरबंद नसतो, तसा शब्दांच्या प्रभावालाही नसतो.
साहित्यप्रधान पत्रव्यवहार करण्यात नाणावलेल्या लेडी मेरी मांटेग्यू (ज. १६९०, मृ. १७६२) यांनी म्हटले आहे की, "कठोर कृत्यांना मऊ गुलगुलीत नावे द्यायची, हे आमच्या उन्नत (रिफाइण्ड) जीवनाचे एक पाप झाले आहे. शब्द म्हणजे तरी काय? आमचे विचार, कल्पना किंवा भावना चित्रित करणाऱ्या साध्यासुध्या खुणा. इतक्याच वाजवी मोलमापाने शब्दांचा समज करून घेण्याचा प्रघात पडला आणि स्थावर श्लेषार्थ गृढार्थ बसवून भलभलते आरोप करण्याची प्रथा बंद पडेल, तर जगातले बरेचसे वादविवाद कमी होतील." (लॉक, ह्यूमन् अण्डरस्टॅण्डिंग)
ह्याचा एक दाखला पहा. जानेवारी, फेब्रुवारी १९५५ मध्ये फोर्मोसा हा एक जागतिक विवंचनेचा प्रश्न झाला होता. भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू लंडन येथे कॉमनवेल्थ परिषदेला गेले असता, अमेरिकन बातमीदार मि. मरो ह्यांनी मुलाखत घेतली. तो टेलिव्हिजन बोलपटाने संबंध अमेरिकेभर ता. १५-२-१९५५ च्या रात्री दाखविण्यात आली. फोर्मोसा प्रकरणी शांततेची काही आशा आहे काय? असा प्रश्न मी मि. मरो यांनी विचारला असता, पंडितजी म्हणाले -
"If a person didn`t have hope, he would be unable to function properly. I certainly think it (i.e. peace in Formosa) could be hammered out." (Free Press Bulletin, 16-2-1956)
सरळ शब्दांचे सरळ वाक्य आहे हे. जागतिक शांततेचा भारत कट्टर पुरस्कर्ता आहे, हेही जगजाहीर आहे. तरीही `हॅमर्ड आऊट` या शब्दावर काही युरोपियन आणि अमेरिकन चिकित्सकांनी आपेक्षा घ्यायचा तो घेतलाय. "ठोकाठोकीने शांतता प्रस्थापित करता येईल, असा तर पंडितजीच्या बोलण्यात सूर नसावा ना?" अशा शंका व्यक्त केल्या गेल्या. वरील वाक्याचा मऱ्हाठी सरळ भावार्थ केला तर तो असा होतो - "आशाच खुंटली तर माणसाला घड काहीच करता येणार नाही. हजार खटपटी करून (हॅमर्ड आऊट) फोर्मोसात शांतता प्रस्थापित करता येईल, असे मला खचित वाटते." आजकालच्या जमान्यात शब्द कसे तोलून मापून बोलावे लागतात, याचा हा दाखला आहे.
डॉ. जॉन्सन आपला प्रचंड इंग्रजी शब्दकोश लिहिण्यात गढला असता, शब्दांची शक्ती आणि माहात्म्य ह्याविषयी एकाशी बोलताना म्हणाले - "मी शब्दकोश लिहिण्यात गढलो असलो, तरी शब्द म्हणजे पृथ्वीच्या कन्यका आणि वस्तुजात (थिंग्ज) म्हणजे स्वर्गाचे पुत्र होत, हे मी विसरलेलो नाही.” हाच आशय `अल्पाक्षररमणीयं यः कथयति स खलु वाग्मी` (थोड्याच शब्दात तो मधुर आणि निश्चित असे भाषण करतो, तो वक्ता) असे सुभाषितकारही म्हणतात.
वक्तृत्वाला अत्यंत अनुकूल आणि पोषक अशा लोकशाही स्वराज्यात आपण आहोत. वाग्विलासाचा परमोच्च उत्कर्ष लोकशाही जमान्यातच झाल्याचे दाखले इतिहासात आहेत. ख्रिस्त शकपूर्व ग्रीक लोकशाहीतच डिमॉस्थेनीस हा अजरामर वक्ता चमकला. सहसा कोणाचीही आपण होऊन स्तुती न करणाऱ्या आखडू डॉ. जॉन्सननेही त्याच्या महासागरी व्याख्यानाविषयी म्हटले आहे की, "त्यातला एक शब्दही इकडे तिकडे करता येणार नाही.” रोमन लोकशाहीत तर काय! वक्तृत्वाचा कळस झाला होता. शेक्सपियरच्या `जुलियस सिझर` नाटकात तो पाहा. पिऱ्हस ह्या रोमन राजाचा मंत्री सिनियस ह्याच्याविषयी अशा आख्यायिका आहे की, त्याच्या चित्तवेधक बोलण्याने जितकी शहरे वश झाली, तितकी त्याच्या धन्याच्या तलवारीनेही झाली नाहीत. केवळ नुसते तोंडचे शब्द. पण केवढा त्यांचा परिणाम आणि पराक्रम!
सीझरचा खून झाल्यानंतर, त्याच्या दफनाच्या प्रसंगी अॅण्टनी उद्वेगाने म्हणाला, ``अहो काय सांगावे? काल - अगदी कालच - सीझरच्या तोंडचा एक शब्द उभ्या जगाला धाक दाखवित होता. पण आज? तो येथे मरून धुळीत पडला आहे आणि क्षुद्र माणसालाही त्याला आदराने वंदन करावेसे वाटत नाही, इतका तो हीन दीन झाला आहे." सीझरच्या आमदानीत गाजलेल्या सिसेरो या तुफानी वक्त्याविषयी, प्रतिस्पर्ध्याचे सशस्त्र सैन्यभार एकीकडे आणि सिसेरोच्या वाग्यंत्राचा भडिमार एकीकडे, असे वर्णन आहे.
लोकशाहीत वाग्विलासाच्या उत्कर्षाला भरपूर वाव असला तरी त्यातील शब्दशक्तीचा विवेक नीट राखावा लागतो. भारत आता एकांड्या राहिला नसून, राजकारणासह त्याचे सर्वांगीण जीवन जागतिक उलाढालींशी निगडीत झाले आहे. महत्त्वाच्या जागतिक मुकाबल्याविषयी भारताचा अधिकृत शब्द अवघ्या एक तासात पंचखंड दुनियेच्या आकाशवाणीने घरोघर पोहोचविला जातो. त्याच्या क्रिया नि प्रतिक्रियाही तितक्याच तातडीने आपल्यालाही समजतात. मुत्सद्दी जनांची भाषा दिवस न् दिवस एक `जंतरमंतर` होत चालली आहे. कोणाचे शब्द वाचावे ऐकावे तर लोण्यापेक्षा गुळगुळीत, पण नीट खोल विचारांची शोधन प्रकाशझोत फेकावा तो त्याच्या पोटात युद्धपिपासा फणफणत असल्याचे आढळते. दुसऱ्याचा शब्द पाहावा तर तो तेलापेक्षा मऊ, थोड्या काळाने तोच शब्द म्हणजे म्यानाबाहेर उपसलेली नागवी तलवारच असल्याचा पुरावा पटतो. यावरून शब्दांचे महात्म्य आणि त्यांची शक्ती किती जबरदस्त आहे, हे पटेल.
शब्द म्हणजे स्मरणाचे वाटाडे
कित्येक शब्द अथवा नावे नुसती विचारली का चटकन आपली स्मरणशक्ती जागृत होऊन, त्या शब्दामागे असलेली घटना, व्यक्ती अथवा इतिहास आपल्या मनश्चक्षुपुढे सिनेमा सारखा दिसू लागतो. हा शब्दांचा परिणाम संभाषणाच्या प्रसंगी अथवा भाषणाच्या प्रसंगी वक्त्याला फार उपयोगी पडतो. `स्वराज्य` शब्द कानी पडला का आलीच समोर श्रीशिवरायांची मूर्ती. झाला चालू शिवशाहीच्या इतिहासाचा तपशील डोळ्यांपुढे नाचायला. `सिंहगड` म्हटला की तानाजी आणि `पावनखिंड` म्हटली की बाजीप्रभू देशपांडे आठवलेच आपल्याला. `निःशस्त्र सत्याग्रह` आठवला का महात्मा गांधींची हालचाल झालीच चालू मनःपटलावर. `अभंग` म्हटला का तुकाराम, `आर्या` म्हटली की मोरोपंत आणि `लावणी` म्हटली की होनाजी बाळा नि रामजोशी हातातले कडे कडाडवीत सरसावलेच आमच्या पुढे. शब्दांचा परिणाम कसा होतो याविषयी डॉ. कॉन्वेल म्हणतात:
"अहाहा! शब्दांचा महिमा काय सांगावा? त्यांच्या जोरावर आम्ही सर्व मानवी अंतःकरणे इच्छेप्रमाणे आमच्या कब्ज्यात आणू शकतो. घटकाभर समुद्राचीच गोष्ट घ्या ना. समुद्र. मिटा डोळे आणि गेल्या साली उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही समुद्र जसा पाहिला असेल, त्याची जरा आठवण करा पाहू. त्या पहा. अगदी लांबवर नजर टाका. त्या बारीक बारीक लाटा, सूर्याच्या किरणांना आपल्या पाठीवर नाचवीत नाचवीत, शिपायांच्या शिस्तबाज रांगांनी कशा पुढेपुढे येताहेत त्या फुटल्या! त्या पहा. मध्यंतरी थोडीशी खडकाची एक रांग आहे, तिच्यावर आदळून त्या फुटल्या. जणू काय, दूध घेऊन येणाऱ्या गवळणींचा तांडाच ठेच लागून त्या खडकावर पडल्यामुळे क्षणभर तेथे सगळीकडे दूधच दूध पसरले - अरे पण हे काय? एखाद्या खेळकर लहान मुलांसारख्या ह्या लाटा आपल्या अगदी पायाशी येऊ लागल्या. वाहवा! काय त्यांची मौज तरी! जरा पुढे येतात न येतात तोच मागे सरून आपल्या मागच्या लाटेला डोक्यावर उडी मारण्यास जागा करून आपण खुशाल तिच्या पोटात छपून जातात - ही पहा. गेल्या साली येथे बुडालेल्या गलबताची ही डोलकाठी. अगदी होती तशीच ताठ उभी आहे आणि ते पहा. एक गलबत. अगदी क्षितिजाला जाऊन भिडले आहे. त्या सर्व गोष्टी तुम्हाला आताही दिसतात ना? हा प्रभाव कशाचा बरे? शब्दांचा बरे! शब्दांचा!"
सुप्रसिद्ध भाषाशास्त्री रिचर्ड ट्रेंच (ज. १८०७ मृ. १८८६) ह्याने सन १८५१ साली लिहिलेल्या `स्टडी ऑफ वर्डस` (शब्दांचा अभ्यास) या जगद्विख्यात ग्रंथात म्हटले आहे –
"In words even taken singly, there are boundless stores of moral and historic truth, and no less of passion and imagination, laid up."
भावार्थ : "एकेकट्या शब्दात ऐतिहासिक आणि नैतिक सत्य-सिद्धांताचा, त्याचप्रमाणे मनोविकार नि कल्पना यांचा प्रचंड संग्रह भरून राहिलेला आहे."
आपल्याकडच्या लोकप्रचारात असलेल्या म्हणी, उखाणे, सुभाषिते यांचा अभ्यास केला तर रिचर्ड ट्रेंचच्या विधानाचा पुरावा पुष्कळ मिळेल.
शब्दांचे सामर्थ्य
शस्त्रास्त्रांच्या खणाखणीपेक्षाही शब्दांचे समर्थ प्रचंड असते. केवळ एका शब्दोच्चाराने राज्यक्रांत्या घडविलेल्या आहे. थोर पुरुषांचे भावनांच्या आत्यंतिक उद्रेकाने प्रसंगोपात बाहेर पडलेले उद्गार आणि लोकांना चेतविण्यासाठी अथवा चिथावण्यासाठीही दिलेल्या घोषणा यांनी इकडची दुनिया तिकडे केल्याचे दाखले आहेत. `बस्स, आता बर्लिन ट बकिंघॅम` अशी हिटलरने घोषणा करताय, सारे जर्मन सैनिक तळहातावर शिरे घेऊन इंग्लंडचा खातमा करायला बेफाम फुरफुरले.
सन १८५७च्या मीरतच्या बंडवाल्यांनी दिलेल्या `चलो दिल्ली` घोषणेचा प्रतिध्वनी सन १९४६च्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेच्या चैतन्यात उमटला आणि त्याने ब्रिटिशांच्या हिंदवी राज्यसत्तेचा पायाच निखळून टाकला. `स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच` ह्या लोकमान्य टिळकांच्या गर्जनेने उभा भारतखंड शहारला आणि ब्रिटिशांना धडकी भरली. महात्मा गांधींनी `क्विट इंडिया` (छोडो भारत)ची घोषणा करताच उभा हिंदुस्थान इंग्रजांना खायला उठला. अगदी ताजे उदाहरण "मुंबई, बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे", ह्या घोषणेचेच घ्या ना. शहरांपासून थेट दहा झोपड्यांच्या चिमुकल्या खेड्यापर्यंत एकजात मऱ्हाठा चवताळून उठला आणि त्याने अखेरच्या एकाच दणदणीत टोल्याने द्विभाषिकाचे लोढणे झुगारून महाराष्ट्र राज्याची प्राणप्रतिष्ठा केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य-साधनेच्या उपक्रमात दादाजी नरस प्रभू देशपांडे ह्याला रोहिडेश्वरासमक्ष महाराजांनी बेलभंडाराची पहिली शपथ दिली. "शिवाजीला सामील होऊन शहाशी बेमानी करतो? नीट टाळ्यावर येऊन शिरवळच्या अमीनाशी रूजू रहा. नाहीतर शहा विजापुरी नेऊन तुझी गर्दन मारतील." असा दमदाटीचा खलिता दादाजी प्रभूला आला. त्यावर महाराजांनी त्याला दिलदिलाशाची चिठ्ठी लिहिली, त्यात म्हटले - "तुम्ही आम्ही आदिलशहाशी बेमानगिरी बिलकूल करीत नाही. रोहिडेश्वराने आम्हाला यश दिले आणि पुढेही तोच आमचे हिंदवी स्वराज्याचे मनोरथ पुरे करण्यास समर्थ्य आहे. हे राज्य व्हावे हे श्रीच्याच मनात आहे." या शेवटच्या वाक्यातच आत्मशक्तीचा केवढा स्फुल्लिंग घमघमत होता, हे पुढे इतिहासात सिद्ध झाले. झाशीच्या राणीचे "मेरी झाशी नहीं दूंगी" हे निर्धाराचे उद्गारच तिच्या पुढच्या सर्व क्षात्रतेजात रसरशीत उजाळलेले दिसले. लोकमान्य टिळकांची स्वराज्य दौऱ्यातील भाषणे ऐकायला साधी नि बालबोध खरी, पण त्यातला एकेक शब्द प्रचंड शक्तीचा असल्यामुळेच, स्वराज्यप्राप्तीसाठी उभा महाराष्ट्र आणि बंगाल खडबडून उठला.
हडबडू गडबडू नका
खलेल खेकटी खब्री। खलखला खर्खरे खरे ।
खबरर्दारी खुसी खासा । जेथे तेथे विटेचि ना ।। १।।
धीर्धरा धीर्धरा तकवा । हडबडू गडबडू नका ।
काळ देखोनि वर्तावे । सांडावे भय पोटिचे ।। २॥
धरावा धीर तो मोठा । विचारे पाहता बरे ।
अधीर माणसे खोटी । काम काही कळेचि ना ॥ ३॥
धोकेचि चळचळा कापे। भेणेंचि फळाफळा मुते ।
बोबडी पडली तोंडी । घाबिरे चाचरे पडे।। ४ ।।
खादाड आळसी मंदू ।, सूचना ते कळेचि ना।
प्रसंगी चळचळा कापे । तो प्राणी आत्मघातकी ।। ५॥
समर्थ रामदासांच्या ह्या उद्गारात केवढे सामर्थ्य भरले आहे ते पहा. त्यांच्या `सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी` या भीमरूपी मारुतीच्या आरतीतले शब्दच नीट पहा. रामदासी वाङ्मय म्हणजे ज्वालाग्राही शब्दांचे खच्चून भरलेले कठोर. ठिणगी लागायचा अवकाश, का भडकले. मारुती-उपासनेच्या निमित्ताने लोकांत नवजागृतीचा आत्मविश्वास निर्माण करण्याची थोर कामगिरी रामदासांनी बजावलेली आहे आणि ती कशाच्या जोरावर? फक्त शब्दांच्या!
मऱ्हाठशाही काळ म्हणजे महाराष्ट्राच्या क्षात्रधर्माच्या उत्कर्षाचा काळ होय. `राष्ट्रीय मनोवृत्ती राष्ट्रीय भाषणात उमटलेली असते`, या डीन आल्फर्डच्या उक्तीप्रमाणे त्याकाळच्या बखरकार शाहिरांची भाषा, मग ती गद्याची असो वा पद्यात असो, तलवारीचा खगखगाट करणारीच होती. पेशवाईच्या मध्यावरील आर्यपंडित मोरोपंतांची कामगिरी पहावी. आपल्या विशाल काव्यसागरातून तेहि जागोजाग मर्दानी पुरुषार्थाचीच चेतवनी मऱ्हाठदेशियांना देत होते. समरांगणातून माघार घेऊन परतलेल्या आपल्या पुत्राची (संजयची) विदुलेने केलेली कान उघडणी पहा कशी ठसठशीत भाषेत रोखठोक शब्दांनी रेखाटली आहे ती -
विदुला म्हणे अहा रे क्लीबा मंदा कसा पळालास
कां वांचलासि? अयशस्कर ऐसा तूं न कां गळालास?
अरि हरिल राज्य मग तूं वटिशिल वृत्यर्थ काय माधुकरी
सुखकर सुकर्म टाकुनि, असुखकर कुकर्म कोण साधु करी?
अधमा तुवां मरावे, क्षणहि न बुडवूनि मान वांचावे,
काळा! यासम अन्यहि जे असतिल त्यांहि मानवां चावे.
(नामर्द षंढा, तुझ्याच्याने पळवले तरी कसे? आणि वाचलास तरी कशाला? त्यापेक्षा तुझा गर्भपात झाला असता तरी मला इतके वाईट वाटले नसते. शत्रूने तुझे राज्य हिसकावून घेतल्यावर, मूर्खा तू काय हातात चौपदरी घेऊन भीक मागणार काय? जा, मर जा. अपमान सहन करून एक क्षणभरसुद्धा जगू नकोस. हे मृत्यो, आणखी जे कोणी असलेच नामर्द षंढ असतील त्यांचा आधी निःपात कर रे बाबा.)
मातेच्या त्या खातेदार शब्दांचा परिणाम संजयावर झाला नि त्याने शत्रूला अखेर पाणी पाजले नि विजयी झाला. असा असतो शब्दांच्या पराक्रमांचा महिमा.
`प्रत्येक शब्द आपल्याशी जणू बोलतो`
"मला शब्दांची फार किंमत वाटते. शब्दात शक्ती असते." या विषयावर पूज्य विनोबा भावे यांनी सन १९५७ साली शब्द सामर्थ्याचे विवेचन करणारे अतिशय उद्बोधक भाषण केले. ते मुद्दाम येथे समग्र देत आहे. त्या वर्षी विनोबा केरळच्या दौऱ्यावर असताना साहित्यिकांपुढे ते केले होते. ते `नवयुग` साप्ताहिक दि. २५-८-५७ वरून साभार येथे घेतले आहे.
"मला शब्दांची फार किंमत वाटते. शब्दांत जी शक्ती आहे, ती दुसऱ्या कोणत्याही वस्तूत आढळत नाही. माझ्या जीवनावर शब्दांचा जो प्रभाव पडलेला आहे, त्या अनुभवावरून मी हे सांगत आहे. पाणिनीचे एक सूत्र आहे – `एकः शब्दः सम्यक् ज्ञातः, सम्यक् प्रयुक्तः, स्वर्गे लोके, कामधुक् भवति।` `एक शब्द यथायोग्य अर्थाने जाणला आणि तसाच यथायोग्य अर्थी वापरला तर स्वर्गातल्या कामधेनूप्रमाणे सर्व अर्थ पूर्ण करणारा होतो.`
आपल्या संस्कृत भाषेत शब्दशक्ती पुष्कळच प्रकट झालेली आहे. इंग्रजी भाषेत लाखो शब्दांचा संग्रह आहे, हे तुम्ही जाणताच. परंतु तो केवळ शब्दसंग्रहच आहे. त्यापासून शक्ती प्रकट होत नाही. एकेका यंत्राचे असंख्य भाग असतात. प्रत्येकाला निरनिराळे नाव असते. अशा रीतीने एकेका यंत्रामध्ये दहा-दहा, पन्नास पन्नास शब्दांचा उपयोग केलेला असतो. परंतु अशा तऱ्हेच्या शब्दभांडारामुळे शब्दशक्ती वाढतेच असे काही नाही. जीवनात जेवढा परिग्रह वाढेल, कचरा वाढेल तेवढे शब्दही वाढतील. अशा रीतीने शब्दांचा ढीग लागेल, परंतु त्यायोगे विचारसंपदा काही वाढणार नाही. तसे पाहिले तर इंग्रजीत विचारसंपदा पुष्कळ आहे. परंतु संस्कृत भाषेत शब्दांचा जो महिमा पाहावयास मिळतो, तो तेथे नाही. पन्नास नवीन नवीन वस्तू बनविल्या तर त्यांच्यासाठी पन्नास नवीन शब्दही बनतील, परंतु अशा शब्दसंग्रहामुळे व्यर्थ परिग्रह मात्र वाढतो.
आता हे पाश्चात्य लोकांनाही कळले आहे. म्हणून आज एकेका यंत्राच्या एकेका भागाला स्वतंत्र नाव दिले जात नाही. आकड्यात नाव दिले जाते. यंत्राचा भाग खरेदी करावयाचा असेल तर `अमूक एक नंबरचा भाग द्या` असे म्हणावे लागेल. आकड्यातच मागणी करावी लागेल. अशा रीतीने यंत्राच्या अनेक भागांना स्वतंत्र नावे देण्याऐवजी आकड्यांच्या साहाय्याने काम भागविले जात आहे. परंतु संस्कृतमध्ये आपल्याला काय दिसते?"
शब्दांना व्यक्तित्व आहे
संस्कृतमध्ये `विचाराचा प्रतिनिधी म्हणून शब्द बनविला गेला आहे, जसे पृथ्वी, जमीन हे शब्द आहेत. इंग्रजी भाषेत पृथ्वीला अर्थ (Earth), लॅटिनमध्ये टेरा (Terra) म्हणतात. अशा रीतीने एक शब्द `अर्थ` आणि दुसरा `टेरा` परंतु संस्कृतमध्ये पृथ्वीला ५० शब्द मिळतात.
`पृथ्वी` म्हणजे पसरलेली. `धरा` म्हणजे धारण करणारी. `भूमि` म्हणजे तऱ्हेतऱ्हेच्या पदार्थांना जन्म देणारी. `गुर्वी` म्हणजे भारी, वजनदार, `उर्वी` म्हणजे विशाल. `क्षमा` म्हणजे सहन करणारी. आम्ही लाथ हाणली तरी ती सहन करते. अशा प्रकारे एकेक शब्द म्हणजे गुणवाचक आहे. एकेका शब्दाबरोबर त्याचा एकेक गुण ध्यानात येतो. कवी कविता करताना किती मात्रांचा शब्द पाहिजे हे पाहतो. अमुक मात्रांचा पाहिजे असेल, तर तो जुळवतात आणि एक छंद बनवतात आणि छंद बनविण्यासाठीच हे इतके शब्द आहेत, असे समजतात. परंतु हे सर्व शब्द केवळ छंद बनविण्यासाठी नसून एकेका वस्तूतील विशेष गुणदर्शन घडविण्यासाठी आहेत.
जेव्हा आपण व्यापक, दूरवर पसरलेली `पृथ्वी` म्हणतो, तेव्हा त्या पदार्थाकडे आपण आंतरिक दृष्टीने पाहू लागतो. अशा तऱ्हेने संस्कृत शब्दात विचार भरलेला आहे. प्रत्येक शब्द आपल्याशी जणू बोलतो. इंग्रजी शब्द अशा तऱ्हेने बोलत नाही. `वॉटर` हा शब्द काही बोलत नाही. आम्हीच जर त्याच्याशी काही बोलू तर गोष्ट निराळी. परंतु संस्कृत शब्द आपल्याशी बोलायला लागतो. `पयः` पोषण करणारा. `पानीयम्` तृप्त करणारा. `उदकं` अंतरातून बाहेर आलेला. `समुद्र` हा शब्द छोटासा दिसतो खरा, परंतु तो गोष्टी करतो. `सम्` म्हणजे चोहोबाजूला समान रीतीने पसरलेला. `उद` म्हणजे वर आलेले पाणी आणि `रम्` म्हणजे आल्हाददायक, खेळत असलेला, उसळत असलेला. तेव्हा `समुद्र` म्हणजे सम् + उद् + रम्`.
"समुद्रात उर्मिः मधुमान् उदारत्.` वेदाने म्हटले आहे की, ह्या हृदयात समुद्राप्रमाणे असंख्य भावना उठत आहेत. हे हृदय म्हणजे जणू समुद्र आहे. समुद्राचे दृश्य हृदयात प्रकट होते. `सी (Sea)` म्हटले तर काय कळणार? आहे एक पदार्थ. कारण तो शब्द बोलत नाही, मुका आहे.
"दुग्धम्` म्हणजे दोहन केलेला, साररूप. `घृतम्` म्हणजे अत्यंत पवित्र, निर्मळ, कचरा काढलेला `घृतं मे चक्षु:` - विश्वामित्र म्हणतो - "माझे डोळे म्हणजे जणू तूप आहे" - इंग्रजी अथवा कुठल्याही भाषेत असे कोणी म्हटलेले नाही. `घृतं मे चक्षु:` म्हणजे `माझे डोळे इतके पवित्र आहेत की कसल्याही प्रकारचे पाप ग्रहण करण्याची शक्ती त्यांच्यात नाही. ते अत्यंत निर्मळ आणि स्वच्छ आहेत."
`अग्नि` म्हणजे `Fire` फायर म्हटल्याने काय कळले? काही नाही. परंतु अग्नि म्हणजे `अंजनात् अग्निः` एक रूप प्रकट झाले, व्यक्त झाले. `वन्ही` म्हणजे जो वाहक आहे. संदेश घेऊन जातो तो. यज्ञात आहुती टाकली तर अग्नी आपली भक्ती वर ईश्वराकडे पोहोचवितो. तेव्हा `अग्नीमिळे पुरोहितम्`च्या ऐवजी `वन्हीमिळे पुरोहितम्` हे नाही चालणार. अगदीच निराळा अर्थ होईल. अशा तऱ्हेने एकेका शब्दाचे काही विशेष महत्त्व आहे.
संस्कृतमध्ये एकेका शब्दाला व्यक्तिमत्त्व आहे. `पियूषं`, `अमृत` आणि `सुधा` हे तीन शब्द अमृतासाठी आहेत, परंतु प्रत्येकापासून विशेष अर्थाचा बोध होतो. `अमरा निर्जरा देवा` अमरकोषाचा आरंभच ह्या वाक्याने होतो. पण `अमरा` निराळे आणि `निर्जरा` ही निराळे. अमर तो की जो मरत नाही. परंतु समजा की, एक वृद्ध आहे, रोगाने पिडलेला आहे, तर तो काय अमर होणे पसंत करील? तो ईश्वराची प्रार्थनाच करील की `मला लौकर घेऊन जा.` म्हणून `निर्जरा` म्हटले आहे. `निर्जरा` म्हणजे जरारहित. जरारहित जो असेल, तो अमर होऊ शकतो.
शब्दांतर्गत प्रवेश
संस्कृतच्या शब्दकोशातही काव्य आहे! एकेका शब्दाची किती तरी प्रकारची व्युत्पत्ती असते. एका शब्दाचा अनेक अर्थ आणि अनेक अर्थाचा एक शब्द! म्हणून संस्कृतमध्ये जेवढ्या निर्मळपणाने वाक्दर्शन होत तेवढेच क्वचितच दुसऱ्या कुठल्या भाषेत होत असेल. या देशात शब्दशक्ती पुष्कळ आहे. अरेबिक, ग्रीक, लॅटिन या भाषांतही काही शक्ती आहे. त्यांच्याशी थोडी तुलना होऊ शकते, परंतु संस्कृतमधला शब्द जसे व्याख्यान द्यायला सुरुवात करतो, तसे या भाषातील शब्द देत नाहीत. `घट` हा शब्द आहे. `घट` महणजे घडा, घागर. परंतु `घट` म्हणजे शरीर असाही अर्थ होतो. घागरीत पाणी ठेवतात तसे या शरीरात काय आहे? पाणीच भरलेले आहे. पूर्ण कुंभ - पाण्याने भरलेली घागर घेऊन आपण स्वागत करतो. यामधून आपल्याला काय दाखवायचे असते? `आमचे हे सारे हृदय भक्तिभावाने भरलेले आहे.` - या अर्थाने हा `घट` शब्द उपयोगी पडेल. नानकांनी म्हटले आहे, - `प्रभू घट घट में भरा है।` माझ्यासमोर जे बसले आहेत, ते सर्व `घट`च आहेत. सर्व भरलेले आहेत, परंतु कशाने भरलेले आहेत कुणास ठाऊक? काही निरुपयोगी वस्तूंनीही भरलेले असू शकतील. सांगण्याचा मथितार्थ असा की, `घट` शब्दातील ही जी खुबी आहे, ती पॉट (Pot) शब्दात काही येत नाही. कारण `घट` याची एक घटना आहे ना! आपल्या शरीराची एक घटना आहे. `घट` हा शब्द ही घटना सूचित करतो. अशा तऱ्हेने इंग्रजी, फ्रेंच आदि शब्द आपल्याला त्यांच्या आत प्रवेश करू देतात आणि म्हणूनच शब्दांनी शक्ती प्रकट होते.
आपले दुर्लक्ष
`चक्षु` शब्द आहे. `चक्षु` हा धातू निर्मलतेचा, स्वच्छतेचा द्योतक आहे. डोळ्यांनी जेवढे आपण बोलतो तेवढे तोंडाने बोलत नसतो. आपल्याला राग येतो, तेव्हा डोळे बोलतात. अंतःकरणात करुणा असेल, तर डोळे बोलतात. शब्दांपेक्षाही अधिक प्रकाश डोळे देत असतात. त्याचप्रमाणे `व्याचक्षते` म्हणजे व्याख्यान देणे. चक्षुपासूनच व्याख्यान हा शब्द निघाला. आम्हा हिंदुस्थानच्या लोकांची महापुरुषांच्या दर्शनावर जेवढी श्रद्धा आहे. तेवढी काही व्याख्यान ऐकण्यावर नाही. महापुरुषांच्या डोळ्यांवाटे जे दिसते, ते कोणत्याही अन्य रीतीने प्रकट होत नाही. त्यांच्या डोळ्यांत कारुण्य भरलेले असते. `कारुण्य` म्हणजे काय? Mercy, Kindness काहीही म्हणा, अर्थ प्रकट होत नाही, परंतु `करुणा` काय सांगते? काही ना काही करण्याची प्रेरणा देते.
हृदयात प्रेम आहे. पण ते व्यक्त करण्याची प्रेरणा नसेल तर ती करुणा नव्हे. करुणा स्वस्थ बसत नाही. लोक विचारतात : "बाबा का फिरत आहे? इतके फिरतो आहे, थकत कसा नाही?" तेव्हा ही जी करुणा आहे, ती बाबाला फिरवीत आहे. तीच त्याला काहीतरी करण्याची प्रेरणा देत आहे. ती बसू देत नाही. एखाद्या लहान मुलाला जर विंचू चावला तर काय आपण पाहत बसतो? त्याच्या सेवेसाठी एकदम धावून जातो. करुणा जागेवर स्वस्थ बसू देत नाही आणि हेच तिचे विशेष लक्षण आहे. माझ्यापुढचे हे शुभ्र वस्त्र मी पाहतो आहे. शुभ्र म्हणजे काय? `शुभ्र` म्हणजे पवित्र. `शुभ्र` म्हणजे केवळ White नव्हे. `शुभ्र` ह्या शब्दाशी त्याचा संबंध आहे. `शोभा` याही अर्थाशी त्याचा संबंध आहे. तेव्हा `शुभ्र` या शब्दात सौंदर्य आणि पावित्र्य एकरूप झाले.
पुढे आकाशात `शुक्रा`चा उदय होतो. शुक्र पवित्र आहे. शुचि या शब्दापासून `शुक्र` हा शब्द बनलेला आहे. शुक्राला पाहताच पावित्र्याची भावना प्रकट होते. आता आकाशात `सूर्य` आहे. तो सर्वांना प्रेरणा देतो. `सू` धातूपासून `सूर्य` हा शब्द बनला. `सू` म्हणजे प्रेरणा देणे. `मित्र` शब्द आहे. मित्र काय करतो? प्रेम करतो. सूर्याला `मित्र` ही संज्ञा हिंदुस्थानचे लोक देतात. आपल्या किरणांच्या द्वारा तो प्रखर वाटला, तरी आपण त्याला घाबरत नाही. मित्र तोच होऊ शकतो की जो आपल्याकडून कार्य करून घेतो. आपण झोपलेलो असतो, तेव्हा तो उठवतो. बसलेलो असतो तेव्हा काम करून घेतो, हे करणाराच मित्र होय.
तेव्हा `मित्र` ही संज्ञा केवळ सूर्यवाचक नाही, तर प्रेमाने सर्वांची सेवा करणारा असाही अर्थ त्यात आहे. मी येथे बसलो आहे, तेव्हा तो काय करील? बाहेरच बसून राहील. मी थोडासा दरवाजा उघडताच थोडासाच आत येईल. एकदम सगळे दार उघडीन तर तोही आत मुक्त प्रवेश करील. परंतु दरवाजा बंद आहे म्हणून दाराला धक्का देणार नाही. बाहेरच उभा राहील. ही `मित्रा`ची मर्यादा आहे. कधीही गैरहजर राहणार नाही. मालक हवे तर उशिरापर्यंत झोपून राहील, पण तो नाही झोपणार. सेवकाचे संपूर्ण चित्र आपण सूर्यात पाहू शकतो. अशा रीतीने शब्द आपल्याशी बोलत असतात.
भारतात अशा प्रकारची साहित्यशक्ती आहे, तिकडे आतापर्यंत आपले लक्ष गेले नव्हते. आपण जीवनाच्या आत जोपर्यंत प्रवेश करणार नाही, तोपर्यंत आपले लक्ष ह्या गोष्टीकडे जाणार नाही. `सुमन` म्हणजे उत्तम पुष्प. ते आपण अर्पण करतो म्हणजे आपले जे स्वच्छ, निर्मळ मन आहे, तेच आपण अर्पण करीत असतो. `सुमन` ह्या शब्दातील ही खुबी दुसऱ्या शब्दात नाही. हे सर्व ध्यानात घेऊन आम्हाला आमचे चिंतन नीट रीतीने करावयाचे आहे आणि तेव्हाच दुसऱ्या देशापेक्षा हिंदुस्थानचे चिंतन निराळ्या प्रकारचे होईल.
शब्दांची आवक
आज काय होत आहे? बाहेरून - Imported शब्द आणले जात आहेत. ते शब्द आमच्या भाषेवर लादले जात आहेत. परिणाम असा होतो की हे शब्द काही आमच्या जीवनाशी Assimilate एकरूप होत नाहीत.
आता ही `सेक्युलर स्टेट`ची कल्पना आहे. ही कल्पना अगदी एकांगी स्वरूपाची आहे. आम्हाला ती assimilate होऊ शकत नाही. युरोपात तशी परिस्थिती होती, त्यामुळे तशा प्रकारचा रिवाज चालू शकत होता. हिंदुस्थानात धर्म या शब्दाचा उदय झाला. धर्म म्हणजे काय? सर्वांना धारण करणारा, `स्टेट`चेही धारण करणारा. `स्टेट`चा धर्माशी काही संबंध नाही असे जर कोणी म्हणेल, तर त्याचा हिंदुस्थानात अगदीच निराळा अर्थ होईल.
`सेक्युलर` म्हणजे काय? परलोकाचा विचार न करता इहलोंकाचा विचार करणारीच संस्था? आणि तरीही `एकता`, `समता` या गोष्टींवर विश्वास! ह्या विरोधी कल्पना कशा मानल्या जातात? इहलोकाची प्रतिष्ठा करून आणि सर्वांना जर सारखा मताधिकार देऊ तर मग आता सांगा, समान मताधिकाराचे अधिष्ठान भौतिक सृष्टीला काय अनुकूल आहे? ह्याचे उत्तर त्यांच्याजवळ नाही. कारण एखादा बलवान असतो तर दुसरा दुर्बल असतो. बुद्धीबद्दलही तेच. कोणाला बुद्धी असते तर कोणाला नसतेच. एकाच घरात ज्ञानीही असतो आणि अज्ञानीही असतो. तेव्हा सर्वांना एकमताचा अधिकार देण्यात काय न्याय आहे? याचे उत्तर अध्यात्मिक सृष्टीत गेल्याशिवाय मिळणार नाही.
आपण सर्वांना एकमताचा अधिकार दिला आहे. म्हणजेच आपण आत्मिक एकता कबूल केली आहे. बुद्धीचीच जर मर्यादा घालून घेतली असती तर माणशी एक मताचा विचार खतम झाला असता. पण तरीसुद्धा आपण सर्वांना एक मत दिले आहे, तेव्हा कसले साम्य पाहिले? भौतिक साम्य पाहिले? नाही. आत्मिक साम्य पाहिले. याचाच अर्थ असा की आपण आत्म्याची एकता मान्य केलेली आहे. तेव्हा आम्ही केवळ भौतिक चिंतनच करतो हा दावा करता येणार नाही. म्हणजे `सेक्युलर स्टेट`मध्ये `आध्यात्मिक मूल्य` मान्य केले.
`सेक्युलर स्टेट` ह्या शब्दाची न्यूनता ध्यानात आली, तेव्हाच सर्वांना एकमताचा अधिकार देण्यात आला. योग्य शब्दाचा उपयोग केला गेला तर ठीक, नाही तर त्यायोगे चुकीचीही धारणा होऊ शकते. `इंडिपेंडन्स` हा किती अर्थशून्य शब्द आहे. जगात काय चालते? प्रत्येक व्यक्ती एकमेकांवर अवलंबून असते. तेव्हा मग कुठे आहे इंडिपेंडन्स? परंतु `स्वराज्य` हा शब्द Positive अर्थ दर्शवितो. ते राज्य स्वतःचे असते. स्वयंप्रकाशित असते. आज येथे आम्ही परदेशातीलच बुद्धी घेतो, तेव्हा मग हे `स्वराज्य` कसे होणार? केवळ आम्ही आमचे राज्य चालवतो, एवढ्याने काय स्वराज्य झाले? वेदांत आदित्याला स्वराज्याची उपमा दिली आहे. सूर्य आहे `स्वराट्`, कारण तो स्वयंप्रकाशित आहे. चंद्र आहे परप्रकाशित.
वेदांत अग्नीमंडळात म्हटले आहे - "य ते महि स्वराज्य" - स्वराज्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याकाळी त्यांच्यावर कोणाचे तरी राज्य होते, अथवा ते परतंत्र होते, अशी तुमची कल्पना आहे काय? परंतु तसा अर्थ नाही. त्याचा अर्थ असा आहे की जोवर बुद्धी आत्मनिष्ठ होत नाही, तोवर स्वराज्य नाही! आतून प्रकाश मिळेल तर स्वराज्य प्रकट होईल. परंतु आपण म्हणता, `इंडिपेंडन्स`, पण कोणाचे कोणाशी पटत तर नाहीच!
सोशालिझम - एक अर्थशून्य शब्द
आता म्हटले जाते की `सोशॅलिस्ट स्टेट` बनवायचे आहे. हिटलरचाही एक प्रकारचा सोशॅलिझमच होता. त्या शब्दातून काही अर्थच निघत नाही. व्यक्तीला समाजापासून अलग काढले जाते आणि समाज व्यक्तीपासून निराळा समजला जातो, तेव्हा मग कसा अर्थ निघणार? जे कल्पनेतही अलग होऊ शकत नाही ते अगोदर अलग केले गेले आणि मग दोघांमधला संघर्ष मान्य केला गेला. आता म्हणतात, हा संघर्ष मिटविण्याकरीता सोशॅलिझम आणला पाहिजे.
आज प्रत्येकजण आपापला स्वार्थ पाहतो आहे. सर्व चिंतनच चुकीच्या मार्गाने चाललेले आहे. जोपर्यंत आपण आपल्या शब्दांची शक्ती जाणणार नाही आणि जोपर्यंत आपण पश्चिमेकडून शब्द घेत राहू तोपर्यंत आपले चिंतन अशाच चुकीच्या मार्गाने चालू राहणार. आपण आपल्याच शब्दात करू, तर सर्व दुनियेपेक्षा आपले चिंतन निराळे होईल आणि हे सर्व साहित्यिकांना करावयाचे आहे.
इंग्रजी, चीनी, जपानी, फ्रेंच अनेक भाषांतून साहित्य आहे. जी चांगली गोष्ट आहे आणि आपल्या लायक आहे ती तिथून घेतली पाहिजे हे खरे आहे. पण अशीच गोष्ट आपण घेतली पाहिजे की जी आमच्या शब्दात बसते. ती गोष्ट जर आमच्या शब्दांत नीट बसत असेल, तर ती आपल्या दृष्टीने ठीक आणि नीट बसत नसेल ती चुकीची आहे, असे समजले पाहिजे. आपल्या चिंतनात पुष्कळसे चुकीचे शब्द आहेत. परिणामी चिंतनच चुकीचे होत आहे. म्हणून शब्द शोधण्याचे कार्य साहित्यिकांनी केले पाहिजे. लोकांसमोर योग्य शब्द ठेवले पाहिजेत आणि तेव्हाच पुष्कळशी भांडणे मिटतील.
हे सारे सत्पुरुषांचेच कार्य
आज एका गृहस्थांनी मला प्रश्न विचारला, "अनेक संत पुरुष होऊन गेले. त्यांनी कित्येक गोष्टी सांगितल्या, परंतु जबरदस्ती केल्याशिवाय का कोठले काम होऊ शकते?" परंतु इतके साधुसंत होऊन गेले म्हणूनच आम्ही आज असे आहोत, तसे राहिलो आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. ते जर नसते तर आपण जनावरं बनलो असतो. आपण कोठून कोठवर आलो आहोत याचा विचार करा.
महाभारतात प्रसंग आहे, प्रश्न उद्भवला आहे की पत्नीवर पतीचा हक्क आहे की नाही? त्यावेळी हा प्रश्न फार कठीण वाटला. मोठमोठे ज्ञानी, विद्वान लोक तेथे होते. परंतु भीष्म, द्रोण, विदुर सर्वजण विस्मित बनले, कोणीही ह्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही. परंतु आजचा लहान मुलगाही ह्या प्रश्नाचे उत्तर जाणतो.
विदुर म्हणजे काय? पाणिनीचे सूत्र आहे - "यथा विदुर भिदरै" – भेद करण्यात अत्यंत प्रवीण तो भिदुर. भिदुर म्हणजे तोडणारा, फोडणारा. तोडणारे-फोडणारे तर वज्र असते. वज्रालाच भिदुर म्हणतात. सूत्रात हेच सांगितले आहे की ज्यांना `उरु` प्रत्यय लावून विशेष अर्थाचे शब्द बनले आहेत. `भिद्` धातूना `उरु` प्रत्यय लावून `विदुर` हा शब्द बनला. त्याचा अर्थ होतो महाज्ञानी. असा महाज्ञानी तेथे बसला होता. पण तरीसुद्धा निर्णय होऊ शकला नाही. प्रश्न असा होता की चैतन्यमय प्राण पणाला लावता येतो की नाही?
धर्मराज, धर्मनिष्ठ, सत्यनिष्ठ राजा होता. त्याला द्यूताचे निमंत्रण दिले गेले, तेव्हा तो `नाही` म्हणू शकला नाही. नकार देणे हे धर्माच्या विरुद्ध आहे, अशी त्याची समजूत. आज द्यूत खेळणे बेकायदेशीर आहे, अनैतिक आहे, असे कायदाही म्हणेल. परंतु धर्मराज त्यावेळी नकार देऊ शकला नाही. अधर्म होईल अशी त्याला भीती वाटत होती. केवढ्या संकुचित कल्पना होत्या! परंतु त्या काळापासून ह्या काळापर्यंत आपण आलो आहोत. हे सारे सत्पुरुषांचेच कार्य आहे.
शब्दशुचित्वाकडे लक्ष द्या
आज जगात सर्वजन जागतिक शांततेकरिता (World Peace) प्रयत्न करीत आहेत. परंतु होत मात्र काहीच नाही. याचा अर्थ असा मात्र नव्हे की, संतांनी आणि महापुरुषांनी जे कार्य केले आहे, त्याचा काहीच प्रभाव पडलेला नाही. (Peace) `पीस` अशासाठी आज नाही की, त्या शब्दात काही अर्थच नाही. तो शब्दच अर्थशून्य आहे. ज्याला आपण `शांति` म्हणतो ती `पीस` नव्हे, ही Peace तर Violent (हिंसक) ही होऊ शकते.
एखाद्या देशावर व्यापारी बहिष्कार टाकला जातो. ही अगदी `पीसफूल अॅक्शन` परंतु त्यातही हिंसा होते. `तेव्हा ही `शांती` नव्हे. `शांती` या शब्दाचा पीस- Peace या शब्दाशी काहीही संबंध नाही. `पीसफूल` म्हणजे प्रत्यक्ष लाठी चालवणारा नाही इतकेच. मग युक्तीप्रयुक्तीने केलेले कामही `पीसफूल` समजले जाते. म्हणून `पीस` हा विश्वशांती स्थापन करण्याच्या दृष्टीने अगदी कुचकामाचा शब्द आहे. पाश्चात्त्य शब्दामुळे आपल्या चिंतनात सर्व विचार दोष शिरतात. म्हणून ह्यापुढे आता साहित्यिकांना एवढेच करावयाचे आहे की, त्यांनी शब्द शुचित्वाकडे लक्ष द्यावे. शुद्ध शब्दाचा जर अविष्कार होईल, तर आचारही शुद्ध होईल.
शब्द चित्र-कला (उदाहरणांसह)
पाहिलेले देखावे चित्रकार आपल्या कुचलीने रंगवितो, तसा वक्ताही एखाद्या स्थळाचे, घटनेचे, व्यक्तीचे हुबेहुब चित्र शब्दांनी वर्णन करून सांगतो. वक्तृत्वात या शब्दचित्रकलेला फार महत्त्व आहे. पाहिलेल्या, अनुभवलेल्या प्रसंगाची रसभरित वर्णन करून श्रोत्यांना अगदी थेट त्याच परिस्थितीचा रस रंग चाखायला लावणे, याची कित्येकांना साहजिक हातोटीच साधलेली असते. कादंबरीकार असली वर्णने लिहितात. ती शब्दचित्रे वाचून, ऐकणारांपुढे ती साक्षात उभी करण्याचे कामही मोठ्या कुशलतेचे असते. वाचन-कलेची कसोटी येथेच लागते.
आपल्या महाराष्ट्रात शब्दचित्र-लेखक अनेक झाले. त्यात पुराणकार कविजनांचा भरणा मोठा. मुक्तेश्वर, ज्ञानेश्वर, एकनाथ, श्रीधर इत्यादी कितीतरी अजरामर `शब्दचित्र-लेखकांची नावे सांगता येतील. बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड ह्यांनी नागेश विनायक बापट या मशहूर ग्रंथकाराला `शब्दचित्रकार` म्हणून दरमहा १२५ रुपयांवर नेमले होते. महाराजांच्या निसर्ग देखाव्यांची, शिकारीची, रम्य स्थळांची महाराजांच्या भेटीला आलेल्या व्यक्तीची शब्दचित्रे लिहून ती महाराजांना वाचून दाखवायची, असा बापटांचा व्यवसाय असे.
कित्येक वेळा ती वर्णने लिहिण्याऐवजी, महाराजांना तोंडी सांगण्याचे कामही करावे लागत असे. आणि त्यावेळी मात्र बापटांच्या रसाळ वाग्विलासाची खरी कसोटी महाराज अजमावीत असत. शब्दचित्रकाराची करामत जरी गद्यातच असली, तरी पद्यरचना कोणीही नाकारणार नाही. तो गद्यरचनाकार कवीच असतो. कवित्वाच्या सूक्ष्म निरीक्षणाने रेखाटलेली त्याची शब्दचित्रे कशी असावी, ह्याचे `महाराष्ट्र सारस्वत`कर्ते कै. विनायक लक्ष्मण भावे यांनी रंगविलेले शब्दचित्रे पहा –
"फुलांचे अत्तर असे असावे की त्याचा वास घेताच त्या फुलांचा ताटवा मनुष्याच्या डोळ्यासमोर दिसू लागावा. तसेच कवीचे मनोविकाराचे वर्णन - त्याने काढलेले शब्दचित्र - असे असावे की, ते वाचीत असता, ते ते विकार वाचकाच्या मनामध्ये एकदम उभे राहावे व त्याचे मन त्याच विकारांनी व्यापून जावे. क्षणभर तो आपली तहानभूकही विसरून जावा व नकळत झालेल्या परिणामांनी चेतना पावून त्याची इंद्रियेही त्या विकारांचे हावभाव करू लागावी.
कवीने वर्णिलेल्या शृंगाराने वाचक मदनपीडित व्हावा. कवीने दाखवलेले रागाचे चित्र पाहून त्याचेही मन क्रोधाविष्ट व्हावे. कवीच्या हर्षरसाने त्यालाही हासू अनावर होऊन जावे. करुणरसपर भाषणांनी वाचकांच्या डोळ्यांना अश्रूचे पाझर फुटावे. सारांश कवीने वर्णिलेले प्रसंग प्रत्यक्ष अनुभवल्यासारखे वाटावे व ग्रंथ मिटून ठेवला असता झोपेतून जागे झाल्यावर क्षणापूर्वी पाहिलेल्या स्वप्नांनी मनाचा जसा गोंधळ उडतो तसाच गोंधळ उडून जावा. शब्दांनी हा चमत्कार जो कवी घडवून आणू शकेल तोच कवि श्रेष्ठ समजावा. मग तो व्याकरण, व्युत्पत्ती जाणो की न जाणो. त्याची वाक्ये शुद्ध असोत की अशुद्ध असोत, तो विद्वान असो की अविद्वान असो. त्याचे लिहिणे सयमक असो की निर्यमक असो, पण निश्चयाने असे जाणावे की कवी असा तोच."
(महाराष्ट्र सारस्वत, भाग १, पाने ३०१-३०२)
शब्दचित्रकलेचे काही नमुने
पानिपतावरील एक रात्र
काही मंडळी आगट्यांपाशी शेकत, गुडगुड्या ओढीत व चिलमी फुंकीत बसली होती. एका ठिकाणी विस्तवाचा मोठा थोरला भडका झाला होता. त्याचा लाल प्रकाश आजूबाजूला पसरून तेथे बराच गलबला चालला होता. त्यावरून तिकडे बाजार भरलेला असावा असे लालनला वाटले. एक-दोन वेळा तिकडून एक सतारवाला आपली सतार टुणटुण वाजवीत गेला. एक कुळबीन डोईवर घडा घेऊन पाण्याला जात होती. नजिकच्या एका सरदाराच्या तंबूत सारंगी व तबला वाजत होता. त्यांच्या तालसुरावर आपला तालसुर जुळवून नायकिणीचा छमछुम नाच चालला होता. ती दादरे व गझल यांच्या तानांवर ताना मारीत होती. नाचाला बसलेली रंगेल मंडळी खूष होऊन नागासारखी डुलत होती. कोणी `क्या बात है, वा रे वा, आवडाजी! खूप बहार केली` अशा तिला मोठ्याने शाबासक्यांवर शाबासक्या देत होते.
दुसऱ्या एका तंबूत जुव्वेबाज मंडळींचे खेळ चालले होते. ती मंडळी सुरापानाने तर्र झाली होती. तिच्या तारेत फासे टाकताना, हातघाईवर येऊन त्यांची एकमेकांत लठ्ठालठ्ठी चालली होती. तोंडाने शिव्या, हाताने बुक्या व पायांनी लाथा, या तिन्ही हत्यारांचे तेथे मनमुराद प्रहार चालू होते. अंधारातून उनाड कुत्री पिशाच्चासारखी इकडे तिकडे भटकत होती. रस्त्यात मांसखंडे, हाडकांचे तुकडे, वगैरे घाणेरे पदार्थ जमिनीला नाक लावून हुंगीत हुंगीत ती वाटोळी फिरत होती. पलीकडे काही अंतरावर कोल्ही ओरडत होती. त्या कोल्हेकुईला उनाड कुत्री वर तोंड करून मोठ्याने भुंकून जबाब देत होती.
- `पानिपतची मोहीम`
(`शब्दचित्रकार` नागेश विनायक बापट)
थोरल्या बाजीरावाचा दौरा
अरण्यामध्ये आपोआप निर्माण झालेल्या पुष्पवाटिका वाटेत पुष्कळ लागल्या. त्यावरून मंद सुगंध व सुशीतल वायू वाहत होता. मधून-मधून स्फटिकासारख्या स्वच्छ पाण्याचे प्रवाह तापी, नर्मदा इत्यादी नद्यांस मिळण्याकरिता झुळझुळ वाहत होते, त्यांचे संगम लागले. मुसलमानांनी बांधलेल्या काही जुन्या व पडक्या इमारती आणि विहिरी लागल्या. त्यांच्या भगदाडात बसलेली घुबडे भयंकर व खोल स्वराने घूत्कार करीत होती. कोल्ही लांबट स्वरांने कुईकुई असे शब्द करीत होती. त्यामध्ये आणखी वाऱ्याची पिरपीर व नद्यांचे रोरावणे चालले होते. ते किर्र रान संपल्यावर पुढे काही अंतरावर मैदान मुलूख लागला. तेथे आपसुखाने उगवलेली सुंदर सुंदर झाडे व रंगारंगाची फुले दृष्टीस पडली.
ठिकठिकाणी आंबे, चिंचा, पिंपळ, वड वगैरे वृक्षांची दाट छाया होती. आंबराईच्या सभोवती कोठे कळकांची दाट बेटे होती. त्यांमधून वारा खेळे, तेव्हा मुरली किंवा बासरी वाजविल्यासारखा मधूनमधून सुस्वर ध्वनी निघे. पुढे काही छुकती मैदाने लागली. त्यांमध्ये बाजरी व ज्वारीची हिरवीगार शेते दहा-दहा कोसपर्यंत एकसारखी पिकली होती. ती इतकी उंच होती, की घोड्यावरचे राऊत भाल्यांसुद्धा त्यात गडप होत.
काही ठिकाणी ऐन भरात आलेले आम्रवृक्ष जाईजुईसारख्या सुवासिक टवटवीत व कृशांगी वेलींनी गुरफटून गेले होते. त्यांजवरची तांबडी, लाल, पिवळी धमक, काळीभोर, पांढरी सफेद अशा तऱ्हेच्या रंगांची फुले, कळ्या, मोहोर व पालवी आणि त्या दोघांचे प्रेमालिंगन, ही पाहून बाजीरावास काय वाटले असेल याची वाचकांनीच कल्पना करावी. पुढे काही वेली पोटरीएवढ्या जाड व जोमदार होत्या, त्या आपल्या वाढीच्या जोराने एका जरठ वृक्षावरून दुसऱ्या एका जोरदार वृक्षास व दुसऱ्या वृक्षावरून तिसऱ्या एका टवटवीत वृक्षास घट्ट बिलगल्या होत्या!
सातपुड्याच्या डोंगरात हमरस्ता नसून एक मनुष्य जाण्यापुरत्या चिंचोळ्या पायवाटा होत्या. मनुष्याचा वास नसून सर्व जंगल गगनचुंबित प्रचंड वृक्षांनी भरून गेले होते. त्यात अर्धेनंगे भिल्ल मात्र हातात तीरकमान घेऊन कोठे कोठे संचार करीत व एकटा-दुकटा कोणी मुशाफर आढळला की त्याला कंठस्नान घालून त्याची चीज वस्तू लुबाडून घेत. अशी काही मजलांपर्यंत अगण्य अरण्ये लागली. पुढे पळसाचे एक मोठे रान लागले. त्याजवरची पाने उन्हाने वाळून कोळ होऊन खाली गळली होती. त्याजवर तांबूस रंगाची फुले मात्र अवशिष्ट राहिली होती. त्यामुळे ते पलाशवन नुकतेच घोर युद्ध झालेल्या रणभूमीसारखे लालभडक दिसत होते. हे वनश्रीचं मिष्टान्नभोजन धरून बाजीराव आकंठमर्याद तृप्त झाला.
- गणेश विनायक बापट
न्यूयॉर्क शहरातला बर्फवर्षाव
दुसऱ्या दिवशी सकाळी मी झोपेतून जागी होऊन पाहते, तो माझ्या खोलीच्या खिडक्यांची भिंगे विलक्षणच दिसत होती. त्यावर काही पांढरवट पदार्थाचा जाड लेप लागलेला असून, त्या लेपात कोणी अतिसुंदर वेलबुट्टीदार चित्रविचित्र नक्षी काढले असल्याचे दिसून आले. हा चमत्कार काय आहे म्हणून मी पुढे जाऊन पाहते तो रस्ता, घरांची छते, खिडक्या, दारे वगैरे चांदण्यापेक्षा पांढऱ्यास्वच्छ तुषाराने आच्छादित केलेले दिसून आली. काल जे न्यूयॉर्क माझ्या दृष्टीस पडले होते, ते आज अगदी बदलून गेले. ही दोन शहरे एकच आहेत हे सहसा खरे वाटले नाही.
म्याडिसन अवेन्यू, फिफ्थ अवेन्यू वगैरे सुंदर व रुंद रस्ते तुषाराने भरून अगदी अरुंद झाल्यासारखे दिसून आले. या तुषारवृष्टीचा वेग वाढवावा म्हणूनच की काय कोण जाणे, त्यादिवशी प्रचंड वारा वाहत होता व उष्णतामापक यंत्रातील पारा चार अंशांवर आला होता. थंडी तर काय मी म्हणत होती. नळातले पाणी थिजून जाण्याच्या बेतात आले होते. सकाळी न्याहारीच्या वेळी स्वयंपाकिणीने मला रोजच्याप्रमाणे प्यायला पेलाभर दूध आणून दिले, ते तोंडात घेऊन गिळण्यापूर्वी खडीसाखरेच्या खड्याप्रमाणे चावून खावे लागले!
थंडीमुळे विस्तवाची उष्णतादेखील नाहीशी झाल्यासारखी झाली. तुषारवर्षावामुळे रस्त्यात लोकांचे जाणे-येणे बंद झाले. गावात कोठे दुकाने उघडलेली नव्हती. कोणी हतभागी मनुष्य किंवा पशू या भयंकर वृष्टीत सापडला तर तो जिवंत घरी पोहोचेल की नाही याचा संशयच वाटू लागला. रस्त्यात हमेशा जाणाऱ्या ट्रामगाड्या, बग्या, अधांत्रांतील आगगाड्या सर्व काही बंद झाल्या! तुषार पडताना शब्द मुळीच होत नाही. कोणी उभे राहून बारीक सपीठ चाळीत असता ते जसे हलकेच जमिनीवर पडते व ते खाली पडल्याचा शब्द कोणाला ऐकू येत नाही, त्याप्रमाणेच तुषारही कोणाला नकळत पडतो. त्याचे कण आकाशातून खाली येतात, तेव्हा ते पांढऱ्या जाईच्या फुलांच्या नाजूक पाकळ्यांसारखे नाचत बागडत, उडतपडत, गोंधळत, मोठ्या घाईने धावत येत असलेल्या अणुरेणू एवढ्याला आनंदी पऱ्याप्रमाणे सुरेख दिसतात.
काळ्या किंवा काळसर रंगांच्या कापडावर काही तुषारकण धरून पाहिले असता, त्याच्या आकृती बहुत सुंदर व विचित्र असलेल्या दिसून येतात. अशा त्या पांढऱ्या फटफटीत तुषाराने आच्छादून गेलेली जमीन, झाडे-झुडपे, मैदाने, रस्ते व घरांची छते किती सुरेख आणि चमत्कारिक दिसतात, हे ज्याने पाहिले नाही, त्याला सांगून कळावयाचे नाही. त्या सुंदर देखाव्याचे वर्णन करायला एखादा कालिदास, शेक्सपिअर किंवा साक्षात सरस्वती देवीच असती तर ते तीस साधले असते. माझ्यासारख्या अल्पमती मनुष्याने त्याचे वर्णन करू लागणे म्हणजे केवळ मूर्खपणा आहे.
- पंडिता रमाबाई (युनायटेड स्टेटसचा प्रवास.)
प्रकरण ९
बालबोध शब्दयोजना
शब्दांचे सामर्थ्य अभ्यासल्यानंतर, आपली शब्दयोजना म्हणजे भाषाशैली कशी असावी, याचा आता विचार करावयाचा आहे. प्रत्येकाच्या भाषाशैलीत त्याचा स्वभाव आणि पिण्डप्रकृती उमटलेली असते. कोणी कोणाची नक्कल करू शकत नाही आणि केलीच तर तो नेहमी माकडी वळणावरच जाते. जेव्हा एखादा मुनष्य आपल्या नेहमीच्या साहजिक भाषाशैलीने बोलू लागतो, तेव्हा ऐकणाऱ्याला अचंबा वाटतो आणि आनंदही होतो. कारण लिहिण्यात काय, अथवा बोलण्यात काय, विषयाचा वक्ता, कर्ता, लेखक कोण आहे हे जागण्याचे श्रोत्यांना नि वाचकांना आतुरता असते आणि तो प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आढळला का आनंद होतो. स्वाभाविक भाषाशैलीने लिहिण्या-बोलण्यात एक प्रकारचे समाधान असते. भाषाशैलीत स्वभावधर्माचा मुद्दा जरी मुख्य असला तरी अभ्यासाने ती कमवावी लागते. आपल्या भाषाशैलीत आपण लोकांना दिसलो पाहिजे.
साधेपणाची आवश्यकता
साधेपणा हे मोठमोठ्या कलांचे मुख्य लक्षण समजले जाते. साधेपणाचे वर्णन करताच येणे अशक्य आहे, असे सांगून प्रसिद्ध तत्त्ववेत्ता चार्लस वॅग्नर म्हणतो : `जगाचे सर्व सामर्थ्य, त्याचे सर्व सौदर्य, त्यातला सर्व शुद्ध नि निष्कलंक आनंद, चित्ताला समाधान देणाऱ्या, आशांकुराना पल्लवित करणाऱ्या आणि आपल्या जीवनपथावर उज्ज्वल प्रकाशाची किरणे पाडणाऱ्या सर्व गोष्टी, त्याचप्रमाणे आपल्या अंध:कारमय जीवनाच्या पडद्यातून तेजस्वी ध्येयाचा नि प्रज्वलित भाव काळाचा देखावा दाखविणाऱ्या गोष्टी, आपल्याला साधेपणाच्या लोकांकडूनच प्राप्त होतात. कारण त्या सज्जनांनी स्वार्थाचा व घमंडीचा चिखल चिवडीत न बसता, परोपकार हेच आपले ध्येय ठरवून ठेवलेले असते. इतकेच नव्हे तर दुसऱ्याच्या हितासाठी स्वतःचे प्राणार्पण करो म्हणजेच जीविताची इतिकर्तव्यता होय, हे तत्त्व त्यांना उत्तम पटलेले असते.`
बालबोध शब्दयोजना
बालबोध भाषाशैली हेच उत्तम भाषणाचे मर्म. आपण बोलायचे कशाला? आपल्या मनातील विचार इतरांना देण्यासाठीच ना? आपल्या भावनांनी त्यांच्या भावना चेतवण्यासाठीच ना? संभाषणात अथवा व्यासपीठावरील भाषणात, आपले व्यक्तिमत्त्व श्रोत्यांवर बिंबवण्याचाच भाषाशैलीच्या साधनेने आपण यत्न करीत असतो. ती शैली साधी, सोपी नि बालबोध असेल आणि ती अंतरीच्या तळमळीने सुटसुटीत आणि सहजगत्या बाहेर पडत असेल तर ती अडाण्यांना मात्र समजेल आणि पंडितांना उमजणार नाही, असे थोडेच आहे? सोप्या, सुटसुटीत आणि साहजिक भाषाशैलीत, श्रोत्यांच्या मनावर परिणाम करण्याचे जे सामर्थ्य आणि आकर्षण असते, ते स्वतःच्या पांडित्याचा नि विद्वेत्तेचा दिमाख मिरविण्यासाठी मुद्दाम बळेबळे योजिलेल्या अगडबंब नि जाडजूड संस्कृत-मिश्रित शब्दयोजनेत मुळीच नसते.
शब्दब्रह्मांड्या पंडितांची पंचाईत
आपल्या व्याख्यानात जाडजूड संस्कृत शब्दांची वारेमाप पेरणी करून बोलणारे वक्ते, अचानक नाक्षर खेडुतांपुढे अथवा शाळकरी बाल-बालिकांपुढे बोलण्याचा प्रसंग आला का जागच्या जागी थंड पडतात. सरावाच्या धिटाईने ते बोलू लागलेच तर श्रोते घोरू लागतात किंवा हळूहळू `यः पलायते स जीवति` करतात आणि मुले गडबड गोंगाट करू लागतात. मग वक्तेबुवाही आपल्या शब्दावडंबराचा तमाशा आवरता घेतात. नामांकित म्हणून गाजलेले असले शब्दब्रह्मांडाचे वक्ते वरच्यासारखे श्रोतृसमाज पाहून, व्याख्यानाचा बेत रहित करून निघून गेलेले मी पुष्कळ पाहिले आहेत. हे लोक सभात्याग करतील, पण आपल्या भाषणशैलीतला दोष सुधारणार नाहीत. शैलीत दोष आहे, हेच मुळी त्यांना मान्य नसते.
बिशप विल्चरफोर्स (ज. १७५९, मृ. १८३३) हे नामांकित इंग्लिश मुत्सद्दी आणि ख्रिस्तीधर्म प्रचारक होते. एकदा एका पॅरिशच्या पाद्र्याने त्यांना व्याख्यानासाठी बोलावले. स्वारी स्थानापन्न झाल्यावर, पाद्रीबोवा बिशपसाहेबांना म्हणाले, `हे पहा बिशपसाहेब या मोहोल्यातले हे कोळीलोक नाक्षर नि अडाणी आहेत. तेव्हा म्हटलं, आपण सोप्या बालबोध भाषेत त्यांच्यापुढे बोलाल तर बरे होईल`, ठीक आहे, म्हणून बिशपसाहेब बोलायला उठले. ते म्हणाले. -
`Around us we see the apotheosis of nature apodoictic of a theocratic cosmogony.`
पाद्री तर बिचारा सर्दच पडला आणि ते कोळी श्रोते? `आरे आवरा मोटा जाडजूड इद्वान न् असा इड्यापिशासारखा काय बरळतुया रे, चला उठा.` असे कुजबुजत सगळे आपल्या कामाला गेले निघून. तात्पर्य, श्रोतृसमाज कोणताही असो, साक्षर, सुशिक्षितांचा असो, नाक्षर अशिक्षितांचा अथवा अगदी मागास अडाण्यांचा असो किंवा बालबालिकांचा असो, वक्त्याची भाषासरणी नि शैली प्रत्येक ठिकाणी रुचेल पचेल अशी हुकमी तयार पाहिजे. आपल्या मनातले भाव, विचार नि विकास त्यांना सहज समजतील, अशाच बालबोध भाषाशैलीने बोलले पाहिजे. विषय कितीही कठीण किंवा सामान्य बुद्धीला जड असा असला, तरी तो साध्या सुटसुटीत बालबोध भाषेने समजावून सांगण्यातच वक्त्याची खरी शहामत असते.
तुकोबा नि विनोबा यांची वाणी
`भगवद्गीतेसारखा तत्त्वप्रधान ग्रंथ, पण तो मऱ्हाठी बोलीत खुलासेवार सांगताना, विनोबा आणि तुकाराम सहजसोपी भाषा कशी वापरतात पहा -
ते ते भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं
क्षीणे पुण्ये मर्त्थलोक विशंति
एवं त्रयीधर्ममनुपन्ना
गतागतं कामकामा लभन्ते (अ. ९-२१)
या चार ओळींच्या श्लोकासाठी विनोबांची चारच ओळीत प्राकृत अर्थ सांगायचा असल्यामुळे तेथेही त्यांनी किती सोपेपणा आणला आहे पहा -
त्या स्वर्गाते भोगुनी ते विशाळ
क्षीणे पुण्ये मृत्यूलोकास येती
ऐसे निष्ठा ठेवूनी वेदधर्मी
येणे-जाणे जोडिती काममूढ - गीताई
आता तुकोबांच्या अभंगवाणीचा बालबोधपणा पहा. हृदयाच्या तळमळीपुढे साहित्यिकी बंधनांची त्यांना पर्वा नसे. मनीचा भाव श्रोत्यांना नि वाचकांना जितका स्पष्ट सांगता येईल तितका सांगायचा, मग त्यासाठी ४ ओळींच्या श्लोकाबद्दल ७ ओव्या गाव्या लागल्या तरी हरकत नाही, असे त्यांचे धोरण. पहा कसे ते -
ऐसे भोग भोगी जंववरी सुकृत
सरल्या पतीत तोच होय ।। १ ।।
हाक फोडी धर्मदूत महा गजरे
तळी या लोटा रे उन्मत्तासी ।। २।।
पडे दंड शिरी तेव्हा अंतराळी
विमान डळमळी अधोमुख || ३ ||
तेजें भरे नभ पाहती भूलोक
म्हणती पुण्यश्लोक ढांसळला ।।४।।
कौतुक करिती नेणती आपुले
पाप जें कां केलें छळीतसे ।।५।।
असो हे निपूण वैदिकांची कर्मे
निरुपिता वर्मे गतागती ।।६।।
पावती सखया ऐसे कामकामी
तुका म्हणे आम्ही बरे असो।।७।।
लोकवाणी आणि पंडितवाणी
लोक जी भाषा बोलतात आणि जी त्यांना समजते, ती लोकवाणी. लोकांना जी समजत नाही, पण जिच्यामुळे पंडितांच्या पांडित्याचे प्रदर्शन थाटले जाते, ती पंडितवाणी. संस्कृत ही एकच भाषा ज्या कोणेकाळी प्रचारात असावी असे म्हणतात, त्याकाळीसुद्धा प्राकृत म्हणून एक अपभ्रष्ट संस्कृताची प्रचारभाषा स्त्रिया, शूद्रादिक वापरीतच होते, हे प्राचीन संस्कृत नाटकांवरून स्पष्ट दिसते. इ. स. १३व्या शतकापर्यंत म्हणजे इ. स. १२७६ पर्यंत श्री ज्ञानेश्वरांचा जन्म होईपर्यंत, संस्कृताभिमानी मूठभर पंडित एकीकडे आणि प्राकृतातच गुरफटलेली कोटिगणती जनता एकीकडे असा ठळक समाजभेदच पडलेला होता. बहुसंख्यांच्या लोकवाणीला, अल्पसंख्यांकांच्या मगरुर पंडितवाणीने ज्ञानप्राप्तीच्या क्षेत्रात डोकावून पाहण्याचाही उजगर ठेवला नव्हता. म्हणूनच श्री ज्ञानेश्वरांनी संस्कृताची ती तटबंदी उखडून प्राकृत मऱ्हाठी वाणीने आपली भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) लिहून संस्कृतविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला. ज्ञानेश्वरीची भाषा आज जरी तुम्हा-आम्हाला समजायला कठीण जाते, तरी १३व्या शतकातली ती बालबोध लोकवाणीच होती. बहुसंख्य अफाट जनतेच्या कल्याणासाठी श्री ज्ञानेश्वरांनी पंडितवाणीविरुद्ध एवढे बंड केले, तरी पंडितांचा संस्कृताभिमानाचा पीठ कमी पडला नाही. ज्ञानेश्वरानंतर ३०० वर्षांनी जन्मलेल्या श्री एकनाथांच्या काळापर्यंत लोकवाणी विरुद्ध पंडितवाणी हा झगडा चाललेलाच दिसतो. म्हणूनच श्री एकनाथांनीही संस्कृत भाषा देवे केली, मऱ्हाठी काय चोरे आणिली?` असा सणसणीत सवाल पंडितांना टाकला.
लोकवाणीवर संस्कृताची कुरघोडी
लोकवाणीवर संस्कृताची कुरघोडी करण्याचा फंद आजही बंद पडलेला दिसत नाही. भाषाशुद्धीच्या थोतांडाखाली साध्यासुध्या, लोकवाणीत रुढ झालेल्या मऱ्हाठी शब्दांच्या जागी भलभलते संस्कृत शब्द रुढ करण्याचा खटाटोप करणारा एक विक्षिप्त कंपूच महाराष्ट्रात अवतरला आहे. परभाषेतील हरएक शब्दाला संस्कृताच्या आधारे मारून मुटकून बनवलेला प्रतिशब्द रुढ करण्याचा त्यांचा अट्टाहास चालूच आहे, पण साध्यासुध्या शिपाई, रस्ता, खटला, चिटणीस, जबाबदारी, उशीर यासारख्या रुढ शब्दांवरही त्यांचे हल्ले होत आहेत. पार्लमेंट या इंग्रजी शब्दाला खुद्द मध्यवर्ती सरकारने लोकसभा प्रतिशब्द योजिला, तरीही त्या कंपूचा संसद शब्दाचा हट्टवाद चालूच आहे. संस्कृताच्या अभिमानाने मागे पिसाटलेल्या एका आधुनिक शब्दकोशकाराने इंग्रजी झिगझॅग?? या शब्दाला नागमोडी असा सरळ प्रतिशब्द न देता, गोमूत्राकार हा शब्द वापरला आहे. या महाभाषापंडिताला गो-मूत्रविधी कसा होतो हेच दिसले, साप कसा चालतो, ते मात्र आठवले नाही. अहिंसक राजवटीच्या प्रसादपचनाचा तर हा परिणाम नसेल? खरे पाहिले तर गाईचा मूत्रविधी नागमोडी नसतोच. बैलाचा तसा असतो आणि तोही चालत असताना.
आततायी भाषाशुद्धीचा नमुना
साध्यासुध्या मऱ्हाठी लोकभाषेची शुद्धी करण्याच्या दिमाखाने तिच्यावर संस्कृतचा जो आततायी बलात्कार होत आहे, त्यामुळे एकनाथ, नामदेवाच्या, तुकाराम, रामदासांच्या सोज्वळ मराठीला कसले भिकारडे धेडगुजरी रूप येत चालले आहे, त्याचा नमुना खाली दिला आहे.
लोहयान यात्रा : नक्तयानाने नव्हे तर दिनवानाने प्रवास सुखकर होईल याबद्दल आम्हा अखिलांचे एकमत होते. परंतु यातृयानाने, द्रुतयानाने किंवा प्रेषयानाने जावे, हा वादाचा विषय बनला. यातृयानानेच जावे असा निर्णय ठरला. परिषदेच्या अधिकाऱ्यांनी स्थानकापर्यंत जाण्यास आमच्याकरिता जनयानाची व्यवस्था केली होती. आम्ही स्थानकावर पोहोचलो मात्र, आमच्या जनयानाशी पुष्कळ भारवाह आमचा संभार वाहून नेण्यास जमले. त्यांची भृत्या एक रुपया ठरली. आमचे एक मित्र शुल्कपत्रे विकत घेण्यास शुल्कालयात गेले. तेथे यात्रिकांची रांग लागलेली होती. आम्ही मात्र वेदिपत्रयंत्रातून वेदिपत्रे विकत घेऊन वेदीवर संभारासह गेलो. द्रूतयान सिद्ध होते आणि दूरसंकेत पडलेला दिसला. भारवाहांनी आमच्या लोहमंजूषा व पाथेयवह निलयावर ठेविले. सर्वधर मंचावरच सोडून ते चालते झाले. आमचा कोष्ट यात्रिकांनी चिकार भरला होता. सर्वधर मंचाच्या खाली ढकलून रिकाम्या झालेल्या स्थानी मित्रांसह मी मोठ्या कष्टाने बसलो. यात्रिकांकरिता आसने नव्हती. निलयाचे दंड धरून ते उभे होते. इतक्यात हरित्केतू हलताना दिसला आणि संगोप व लोहबंब यांनी ठोकलेला शीष्कारही ऐकू आला. तात्काळ आमचे यान चालू झाले. लवकरच पुढील स्थानक आले. येथे पाच-सहा कलाच काय तो यानाचा विराम झाला. यान संचलित झाले. इतक्यात कोणी शृंखला ओतून भयसूचना दिली. यानरक्षकांसह संगोप आत आला. शुल्कपत्रांची निरीक्षणे करण्यासाठी पत्रग्राह आला. अपत्रिक यात्रिकांकडून अतिरिक्त प्रभार त्यांनी संकलन केला. थोड्याच अवधीत आमचे स्थानक आले आणि आम्ही नियोजित मित्रसदनाकडे प्रयाण केले.
- (तरुण भारत, नागपूर २०-३-५३)
का? लागला का काही अर्थ वरच्या गोमूत्रशुद्ध भाषेचा? आणि या असल्या भाषेत लेख-पुस्तके लिहून छापण्याचा, इतकेच नव्हे तर व्याख्याने देण्याचाही उपद्व्याप काही ह्या भाषाशुद्धीवाल्यांनी चालविलेला आहे. ज्ञानेश्वरपूर्वकाळची संस्कृताभिमानी पण लोकभाषा विरोधी पंडितांची परंपरा अजून जिवंत आहे, हेच ह्यावरून समजायचे.
ह्या अत्याचाराचा परिणाम
ह्या विशिष्ट (का विक्षिप्त?) भाषापद्धतीच्या पुरस्कर्त्यांना लोकवाणीची किंवा लोकशिक्षणाची बिलकूल पर्वा नसते. ह्या हट्टवादाची अखेर, ते एकीकडे आणि जनता एकीकडे, अशी जरी झाली, (आणि तशी आज झालीच आहे.) तरी त्यांचा हा शुद्धीकरणाचा धोब्याचा धंदा ते थांबवणार नाहीत. एका महान पंडिताने तर ज्ञानेश्वरीचे संस्कृत भाषांतर केल्याचे ऐकतो. या उपद्व्यापाचा परिणाम समंजस मध्यमवर्गीयांपेक्षा मागासपणातून वर येऊ पाहणाऱ्या बहुजनसमाजातील महत्त्वाकांक्षी तरुणांवर अतिशय विपरीत होत आहे. थोरांचे अनुकरण करून आत्मोद्धार साधावा, हा मनुष्यस्वभावच आहे. शुद्धिवाल्या पंडितांची भाषा आपल्या लिहिण्या-बोलण्यात आली, तर आपल्यालाही तितका बुद्धिवंतपणाचा मान मिळाल्यासारखे होईल, अशा भाबड्या बुद्धीने मागास आणि अस्पृश्य वर्गातील काही तरुण वक्ते कसे बोलतात, त्याचा नमुना पहा -
`सब्य ग्रहस्तहो, काही अपरिपक्व कारनामामुळे सभेला सुरुवात व्हायला विप्रलंब झाला याबद्दल मी आपली याचना मागतो व दिलगिरी प्रदोशित करतो. आज आपण येथे कशासाठी स्थितप्रज्ञ झालो आहोत, या अफाट अशा विदीर्ण मैदानावर कशासाठी संकष्टित झालो आहोत, हे सर्वांना विज्ञीत आहेच. आपण आपले महत्विक उद्वेग बाजूला ठेवून या ठिकाणी अवतीर्ण झालात, ही आम्हा अस्पर्श समाजावर मोठी सहानुभुवति आहे. आमची अस्पर्शाची किती दैनंदिनी स्थिती झाली आहे, हे मीच नियोजन करायला पाहिजे असे नाही. पांढरपेशा समाजानी आमच्या समाजाची किती उत्प्रेक्षा केली याची द्वाही इतिहासच देऊ शकेल. असो. सभेची सुरुवात आता होणारच. सभेसाठी शिरिमंत शेट गितूभाई यांनी ध्वनिप्रेक्षक यंत्र दिलेले आहे. सर्वप्रकारचे बहुजन येथे आलेले आहेत. एक अत्यंत उल्लंघनीय घटना म्हंजे येथील गोभक्त गवंडेबुवा येथे विराजमान झाले आहेत. गवंडेबुवा समंदी विशिष्ट काय सांगावे? गोसेवा करता करता ते गोमय होऊन बसले. आता आपले अध्यक्ष महाराज काही चार विशाळशील शब्द बोलतील, ते अवसान देऊन आपण ऐकावे. आमचे गरिबांचे आदरातीर्थ गोड करून घ्यावे, इतके बोलून माझे लांबलेले संभाषण पुरे करतो.`
पंडित आणि लोकशिक्षक वक्ते
पंडितांच्या पांडित्याने सामाजिक अथवा राष्ट्रीय क्रांती घडून आल्याचा दाखला नाही. ते कार्य जनतेच्या सर्व थरांशी जिव्हाळ्याचा घनिष्ट संबंध राखून, त्यांच्या बोलीने, बोलून त्यांची मने जिंकणाऱ्या लोकशिक्षक प्रचारी वक्त्यांनीच केल्याचे पुरावे इतिहासात नमूद आहेत. पंडितांचे पांडित्य विद्वज्जनांच्या बंदिस्त सभेत कितीही वाखाणले गेले तरी लोकमताची उठावणी करण्याच्या कामी त्याचा काही उपयोग होऊ शकत नाही. जनता आणि पंडित एकमेकांजवळ येऊच शकत नाहीत. लोकांचा उठाव करण्यासाठी वक्त्याला आत्म्यात आत्मा मिसळण्याची जी कसोशी आवश्यक करावी लागते, तीच नेमकी पंडितांपाशी नसते. पंडितांना आपल्या पांडित्यांचा अभिमान, तर लोकसेवक वक्त्यांना लोकांचा जिव्हाळा आत्मसात करण्याची तळमळ. पंडितांपाशी केवळ पांडित्याची (डोक्याची) श्रीमंती, तर लोकसेवक वक्त्यांपाशी हृदयाची श्रीमंती, अकॅडेमिक (पुस्तकी) आणि पॉप्युलर (लोकप्रिय) असे वक्त्याचे दोन ठळक भेद असतात.
लोकसेवक वक्त्यांची उदाहरणे
लो. टिळक : जातिवंत पट्टीचे पंडित, पण लोकसेवेची दीक्षा घेताक्षणीच त्यांनी आपल्या पांडित्याला बासनात गुंडाळून, साध्यासुध्या लोकवाणीने लोकांच्या उठावणीला हात घातला. जाहीर सभांतील टिळकांची व्याख्याने अगदी निरक्षर खेडुतांपासून तो विद्येच्या शहरी शाहिरांपर्यंत सगळ्यांनाच चटदिशी समजतील, अशा सोप्या बालबोध भाषाशैलीचीच असत. वाक्ये लहान लहान शब्दयोजना खुबीदार पण सोपी. आवाज निकोप, पण विचार आणि विकारांच्या समयोचित मिश्रणाने भिंगरीदार बनलेला. निश्चित विधाने ठाम सिद्धांतांच्या विश्वासाने ठासून सांगण्याचा आवेश आणि विशेष म्हणजे चेहऱ्यावर सारखी चमकणारी हृदयाची उसळती तळमळ एवढ्याच भांडवलावर, लो. टिळकांनी उभा महाराष्ट्र स्वराज्याच्या प्राप्तीसाठी खडबडून जागा केला आणि आपल्या जीवनसाध्याचे ते लोण बंगाल, पंजाब आणि दक्षिणेकडे थेट कन्याकुमारीपर्यंत नेऊन भिडवले. टिळकांची इंग्रजी भाषासुद्धा मऱ्हाठी इतकीच साधी, सोपी नि बालबोध असायची.
साने गुरुजी : बालबोध भाषाशैलीने बालजगताचा आणि श्रमिक जनतेचा आदर, विश्वास नि निष्ठा संपादन करणारा साने गुरुजींसारखा अस्खलित नि कमाल तळमळीचा वक्ता पूर्वी झाला नाही आणि पुढे...! भविष्याचे कोणी काय सांगावे?
महात्मा गांधी : ह्यांची हिंदी भाषा जरी काचरत काचरत असली तरी अत्यंत सोपी असे. इंग्रजी भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व तर अनन्यसामान्य म्हणून पंचखंड दुनियेने वाखाणलेले आहे. पण तेथेसुद्धा त्यांची (बेसिक स्टाइल) बालबोधशैली ऐकणारांना नि वाचणारांना मोहित करीत असे. महात्मा गांधींनीही पांडित्यांची कास न धरता लोकबोलीनेच विशाल भारताच्या अपूर्व उत्थानाचा योग सिद्ध करून जगाचे डोळे दिपवले.
उमेदवार वक्त्यांना ग्लॅडस्टनचा उपदेश
■ सोपी भाषा वापरण्याचा अभ्यास करा, नेहमी सोप्यातला सोपा शब्द वापरण्याची कसोशी करा.
■ वाक्ये छोटी छोटी असावी.
■ शब्दोच्चार स्पष्ट करीत जा.
■ विरोधकांनी किंवा टीकाकारांनी टीका करण्याची वाट न पाहता, तुमच्या विधानांची सत्यता भाषणापूर्वीच स्वतः नीट कसून पडताळून पाहत जा.
■ विषय चांगला आत्मसात करा. त्यातली तत्त्वे नीट पचनी पाडा. एवढे कराल तर योग्य जागी योग्य शब्द योजण्याची समयसूचकता आपोआप साधेल.
■ लक्षात ठेवा, श्रोत्यांवर जर तुम्हाला आपली छाप पाडायची असेल, तर विषयाच्या अनुसंधानाबरोबरच, श्रोत्यांवर होणाऱ्या परिणामांचे नि त्यांच्या हालचालीचे सारखे नीट निरीक्षण करीत राहा.
लोकमान्य टिळकांच्या भाषणाचा नमुना
"होमरूल लीगचे कार्य मोठे व कठीण आहे. त्याच्या मार्गात अडचणी बऱ्याच आहेत. बेळगावास व्याख्यान दिले आणि इतकी खबरदारी घेतली तरी बाजू अंगावर येऊ पहात होती! पण निभावलो. (हशा) होमरूलची देवता मोठी कडक आहे. नाव घेण्याची पंचाईत, न नाव घ्यावे तर ती प्रसन्न होत नाही. ती प्रसन्न व्हायची म्हणजे जप करावा लागतो. पण जसजसा जप करावा तसतशी ती उग्रतर स्वरूप धारण करते. संकटे ही येणारच व ती सोसलीच पाहिजेत. गेल्या वर्षांचा अनुभव सर्वांना ठाऊकच आहे. आजपर्यंत सहा हजार वर्गणीदार झाले आहेत, पण यातले उघड नावे द्यायला तयार किती आहेत? जो नाव देणार त्याच्या पाठीमागे सी.आय.डी. लागणार हे उघड आहे. `आम्ही तसे सी.आय.डी.ला सांगितले आहे` असे गव्हर्नर साहेब म्हणाले. सी.आय.डी. विरुद्ध तर गव्हर्नर साहेब म्हणतात, `माझ्याही मागे सी.आय.डी. आहेत`! गव्हर्नरसाहेबांच्या मागे जसे सी.आय.डी. आहेत तसे ते आमच्या मागे आणणे याचेच नाव स्वराज्य! (टाळ्या) होमरूलची नवी व्याख्या आली आहे! (हशा) आमच्या उद्योगाला काल किती अनुकूल आहे ह्याची पुष्कळांना कल्पनाही नाही. इंग्रजी साम्राज्यावर असा प्रसंग आल्याने त्याला चिरस्थायी करण्यासाठी काही तरी नवीन घटना करणे अवश्य झाले आहे. आमच्याकरिता नव्हे तर सामाज्याच्या बळकटीकरिता सुद्धा हिंदुस्थानला स्वराज्य मिळणे जरूर आहे, असे सांगण्याची आज वेळ आली आहे. (टाळ्या) आम्हाला साम्राज्य पाहिजे म्हणून आम्ही सरकारला पैसे दिले. आता तुम्हाला हे साम्राज्य पाहिजे आहे का असा आमचा प्रश्न आहे. तुम्हाला साम्राज्य पाहिजे असेल तर आम्हाला स्वराज्य द्या (हशा) आणि साम्राज्य सामर्थ्यवान करा. (टाळ्या) रशियातील दडपशाहीची काय अवस्था झाली पहा! तऱ्हा निराळ्या पण सिद्धांत एकच. योग्य प्रयत्न केले तर ईश्वरी कृपेने आलेली परिस्थिती हितावह होईल. आज युरोपचा जमिनीवरच काय, पण समुद्रावरील नकाशसुद्धा बदलत आहे. यावेळी गैदीपणा स्वीकाराल तर तुमच्यासारखे आळशी, मूर्ख व हतभागी कोणी नाही असेच म्हणावे लागेल. जबरदस्तीच्या धोरणाविरूद्ध हे सध्याचे युद्ध चालले आहे. हा शस्त्र (Militarism) आणि स्वातंत्र्य यांचा झगडा आहे. बेलज्यमच्या स्वातंत्र्याकरिताच इंग्लंड युद्धात पडले की नाही? अर्थात् हीच गोष्ट आमच्या भाग्योदयास उत्साहजनक नाही काय?"
प्रकरण १०
संभाषण चातुर्य
उत्तम संभाषक तो उत्तम भाषक ज्याला विकार, विचार नि अर्थानुसार ठाकठिक भाषेत आणि यथोचित स्वरोच्चारांनी संभाषण करता येते, त्याला जाहीर व्याख्याने देताना श्रोत्यांवर वक्तृत्वाची छाप पाडणे फारसे कठीण जात नाही, उलट त्याचेच भाषण उठावदार होऊन, त्याचा परिणामही चांगला वठतो. भाषण म्हणजे दोघांमध्ये किंवा १०-१२ जणांच्या बैठकीत सरळ घरगुती भाषेत होणारा संवाद. वक्तृत्वात प्रावीण्य मिळविण्याचा ओनामा येथूनच सुरू होतो. यासाठी आपल्या नेहमीच्या संभाषण पद्धतीत जितका साहजिकपणा, सुटसुटीतपणा आणि बिनचूकपणा आणता येईल, तितका आणण्याची मेहनत घ्यावी. संभाषण (कॉन्व्हर्सेशन) आणि वादविवाद (डिबेटिंग) करतानाच वाक्चातुर्य म्हणजे काय, ते कसे कमवावे, त्याची मूलतत्त्वे काय, कोणत्या धाटणीची भाषाशैली कोणत्या प्रसंगी कशी वापरली म्हणजे उठावदार होते, मुद्रेवर कसलाही हावभाव न दाखवता, केवळ स्वरोच्चाराने मनोविकार कसे व्यक्त करावे, विरोधकाला अडविण्यासाठी विनोदाचा वळसा किती नि कसा घ्यावा किंवा आव्हानाचा फटकारा काय हिकमतीने द्यावा, इत्यादी खाचाखोचा आपोआप कळू लागतात.
आकर्षक संभाषण करणे, ही एक थोर कलाच आहे. कित्येक लोक असेही आढळतात की त्यांची संभाषणे म्हणजे श्रोत्यांना जणू काय पंचपक्वान्नांची मेजवानीच वाटते, पण त्यांना जाहीर सभेत चार शब्द बोलायला सांगा, ते गारठतात. संभाषणाने ज्ञानाला श्रीमंती चढते. वादविवादाने त्या श्रीमंतीला आणखी झिलई येते. `वादविवाद (डिबेटिंग) पुल्लिंगी आणि संभाषण (कॉन्व्हर्सेशन) स्त्रीलिंगी` असा कर्नाल आल्कॉट यांचा अभिप्राय आहे. तसे पाहिले तर वादविवादात मर्दानीपण लागतो आणि संभाषणात तितका तो असतोच असे नव्हे. संभाषणासाठी काय काय भांडवल लागते, याचे डॉ. जॉन्सनने छान मार्गदर्शन केले आहे.
"संभाषण आणि वादविवादात डॉ. जॉन्सनला बोलताना ऐकणे म्हणजे एक थाटामाटाची मेजवानी असे", असे त्याचा चरित्रकार बॉस्वेल ह्याने म्हटले आहे. तेव्हा जॉन्सनच्या सूचना तितक्याच महत्त्वाच्या असणार. तो म्हणतो- "पहिली गोष्ट म्हणजे ज्ञान. सर्वसामान्य ज्ञान. खूप भरणा पाहिजे त्याचा. दुसरी, शब्दांवर हुकूमत. शब्दभांडार अगदी हुकमी तयार हवे. तिसरी, सामान्यांच्या अटकळीत येणार नाही, अशा पद्धतीने विचार व्यक्त करणारी कल्पनाशक्ती. चवथी, प्रसंगावधान. काय वाटेल ते झाले तरी ते अवधान लवमात्र खचू न देण्याचा खंबीर निर्धार आणि पाचवी, आत्मविश्वास, हा आत्मविश्वासाचा मुद्दा तर इतका आवश्यक आणि महत्त्वाचा आहे की, केवळ त्याच्या अभावी पुष्कळ संभाषणात आणि वादविवादात कुचकामी ठरून बाजूला पडतात."
श्रोतेही तसेच हवेत
चांगल्या रसिक संभाषकाला पुष्कळ वेळा `येथे समस्त बहिरे बसलेत लोक, का भाषणे मधुर तूं करिशी अनेक` असला विचित्र अनुभव येतो. `श्रोत्यांच्या ग्रहणशक्तीची पातळी जर अगदी खालची असेल, तर चुकूनसुद्धा तेथे मी आपले तोंड उघडणार नाही.` असे डॉ. जॉन्सनने म्हटले आहे. श्रोते गंभीर, समंजस, विद्वान, रसिक आणि नवनव्या विचारांचे चाहते असले म्हणजे त्यांच्याबरोबर संभाषणाने विचारांची नि भावनांची देवण-घेवाण करण्यासारखा मनोविकासाचा दुसरा परिणामकारक आणि उत्साहवर्धक मार्गच नाही. "समतोल दोन किंवा अनेक मनोभावनांच्या घर्षणातून प्रकाश आणि उल्हास निर्माण होतो. स्वाध्यायाच्या एकांतवासात जी तत्त्वे आणि सत्ये आपल्याला अंधूक किंवा मलीनशी दिसतात, तो संभाषणाच्या घर्षणात तावून सुलाखून निघाली म्हणजेच त्यांचा खराखुरा रसरशीतपणा आपल्या प्रत्ययाला येतो."
-(डॉ. नॉक्स)
संभाषकातही दोष असतात
काही मंडळी अशी चिकट भेटतात, का आपली इच्छा नसतानाही ते आपला हात धरून, अडवून, आपल्या चऱ्हाटाला सुरूवात करतात. अशा वेळी `ज्ञानापेक्षा अहंपणाच्या घमेंडीनेच फार संभाषणे होतात` हा ला रोशफुकोचा शेरा आणि माणसे जितकी कमी विचार करतात, त्या पेक्षा फार जास्त बोलतात,` हा मॉण्टेस्कूचा इशारा पटू लागतो. लाब्रूयर म्हणतो "उत्तम आकर्षक बोलण्याइतकी चतुराई नसावी आणि गप्प केव्हा बसावे हे समजण्याची अक्कल नसावी, हे मनुष्याचे मोठे दुर्भाग्यच म्हणावे लागते." सर वॉल्टर रेले म्हणत "भडाभडा अद्वातद्वा बडबडणे आवरण्याइतका विवेक ज्याला नाही, त्या माणसाला तटबंदी नसलेल्या शहराचीच उपमा दिली पाहिजे. तसे म्हटले तर जीभ आवरायला काय असे मोठे परिश्रम पडतात?
संभाषणात काय, अथवा वादविवादात काय, हे एकच गमक तुम्ही नीट पथ्यासारखे पाळलेत, तर तुमच्या हातून चूक म्हणून कशी ती होणारच नाही. राग आला तरी गिळावा. इतरांचे खूप ऐकावे आणि मुद्देसूद बोलावे. हे पहा, आपली जीभ एक चमत्कारिक हत्यार आहे. जगातील मोठमोठी लोककल्याणाची कामे हीच करते आणि लोकसंहारालाही हीच जबाबदार असते." संभाषण किंवा वादविवादात खऱ्या अभिरुचीचा आस्वाद घ्यायचा असेल तर, एकमेकांच्या अवगुणांची टर उडवून परस्परांवर मात करण्याची होड घेण्यापेक्षा, एकमेकांच्या चांगल्या गुणांबद्दलच बोलावे.
हेन्री क्लेचा स्वानुभव
हेन्री क्ले (ज. १७७७, म. १८५२) हा अमेरिकन मुत्सद्दी आणि पट्टीचा वक्ता. याला लहानपणापासूनच ऐतिहासिक आणि शास्त्रीय विषयांवरील उत्कृष्ट ग्रंथ वाचण्याचा फार नाद. एखादी घटना अथवा प्रयोग त्याला आवडला की त्यातला सारांश तो आपल्या सोप्या घरगुती भाषाशैलीने घरातल्या मंडळींना कहाणीसारखा सांगण्याचा उद्योग करायचा. कधी कधी त्याच विषयावर घरातच आपल्या खोलीत एकटाच व्याख्यान द्यायचा. त्या आपल्या अभ्यासाविषयी तो म्हणतो - "हे असले तात्कालिक स्फूर्तीचे यत्न मी कधी कधी एखाद्या शेताच्या बांधावर उभे राहून, तर कधी जंगलात जाऊन करीत असे. केव्हा केव्हा गुरांचा गोठा हाच मला पसंत पडून तेथल्या घोडे-बैलांपुढे मी आपली व्याख्याने देत असे.
माझ्या दैवमंदिराला आज जे इतके कारागिराचे उत्कृष्ट रूप आले आहे आणि ज्याच्यावर मी माझी दिनचर्या मोठ्या थाटामाटात नि अब्रूने आज चालवीत आहे, याला मूळ कारण जगातील सर्व कलांत अत्यंत श्रेष्ठ जी वक्तृत्वकला तीच होय. ती कमावण्यासाठी आणि माझ्या हृदयात तिच्याविषयी आपुलकीचा जिवंत जिव्हाळा निर्माण करण्यासाठी, मला वरील प्रकारचे प्राथमिक प्रयत्न फारच फायदेशीर झाले. इहलोक लाभणाऱ्या या उत्कृष्ट संधीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही त्वरा करा. तुमच्या वक्तृत्वाशैलीची रोज उजळणी केल्याशिवाय एकही दिवस वाया जाऊ देऊ नका. वक्तृत्वासारखी उचाट शक्ती जगात दुसरी नाही. सीझरने लोकांची मने भीतीने ग्रस्त करून त्यांच्यावर आपला अंमल गाजवला पण सिसेराने आपल्या मनमोहक वक्तृत्वशैलीने त्यांची मने अंकित करून आपल्या मुठीत ठेवली. सीझरच्या प्रवाहाची इतिश्री त्याच्या मृत्यूबरोबर झाली, पण सिसेराचा महिमा शेकडो वर्षे लोटली तर अजरामर आहे."
उत्तम संभाषकांची उदाहरणे
जाहीर व्याख्यानापेक्षा, खासगी बैठकीतल्या संभाषणांनी मंत्रमुग्ध करण्याची शक्ती महात्मा गांधींत विलक्षण होती. जो कोणी एकदा त्यांच्याजवळ गेला आणि संभाषणाच्या मोहिनीत सापडला, त्याला ते आपणासारखे तात्काळ करीत असत. आगाऊ खूप तयारी करून विरोधाला गेलेले अनेक पाश्चात्य विरोधक त्यांचे भक्त होऊनच परतलेले आहेत. नामदार गोखले यांचीही संभाषणशैली अशीच आकर्षक आणि माणसे जाडणारी असे. उत्कृष्ट इंग्रजी भाषाशैली कमावण्यासाठी त्यानी मेकॉलच्या ग्रंथातील महत्त्वाचे काही भाग अगदी तोंडपाठच केले होते. पाठांतरामुळे गोखल्यांची स्मरणशक्ती विलक्षण हजरजबाबी बनलेली होती. आला भेटीला का धरला वेठीला, इतक्या जबरदस्त संभाषण शैलीचे, नव्हे शक्तीचे तिसरे उदाहरण डॉ. मिसेस ॲनी बेझंटबाईंचे. आपल्या वक्तृत्वाच्या अस्खलित प्रवाहाने पंचखंड दुनियेला मोहिनी घालणाऱ्या बेझंट बाईंना विरोधक नव्हते, असे नाही. पुष्कळ होते जागोजाग होते. पण समोर उभे राहून व्यासपीठावर बाईंना विरोध करणारा बहाद्दर त्यांच्या हयातीत एकही पुढे आला नाही.
एक अनुभविक सूचना
उत्तम संभाषक होऊ इच्छिणारांनी उत्कृष्ट इंग्रजी- मऱ्हाठी नाटकातील स्वगत भाषणे तादात्म्याने वाचण्याची आणि एकांतात तोंडपाठ म्हणण्याची पद्धत चालू ठेवावी. संभाषणाचे प्रसंग व्यवहारात अनेक असतात. व्यापारी जगात तर आकर्षक संभाषकांची मागणी फार असते. सेल्समन वृत्तपत्रांचे बातमीदार, मुलाखती घेणारे, विम्याचे प्रसारक आणि एजंट, जाहिराती गोळा करणारे, पेटण्ट औषध विकणारे आणि त्यासाठी व्यापारी, नि डॉक्टर यांना औषधांचे गुणधर्म समजावून सांगणारे, कितीतरी व्यवसाय आहेत.
मुद्देसूद माहिती थोडक्यात चटकदार आणि परिणामकारक भाषेत सांगणारे आणि आपल्या संभावीत वागणुकीने समोरच्यावर छाप पाडणारेच या व्यवसायात यशस्वी होतात. पत्रकारांच्या बैठकी आणि सार्वजनिक भोजनांच्या प्रसंगीही समयोचित बोलण्याच्या प्रथा सध्या आपल्याकडेही चालू झाल्या आहेत. त्या वेळी कसे बोलावे, याचे मार्मिक दिग्दर्शन शेक्सपिअरने केले आहे, ते असे "भोजनप्रसंगीच्या आजच्या तुझ्या संभाषणातील विचारसरणी तिखट तर खरीच, पण मोजक्या शब्दात पुष्कळ अर्थ व्यक्त करणारी, आनंददायक पण फटकळ नव्हे, विनोदी पण अहंभावी नव्हे, धीट खरी पण उद्धट नव्हे, पांडित्यपूर्ण पण हेकेखोर नव्हे, किंचित विक्षिप्त पण थोतांड नव्हे, अशी होती."
गोष्टी, कथा, कहाण्या
गोष्टी, कथा, कहाण्या ह्यांचा समावेश संभाषण चातुर्यातच होत असतो. श्रावण मासात कहाण्या सांगण्याचा जुन्या आजीबाईंचा प्रघात चांगला होता. आता तो बंद पडला आहे. गोष्टी, कथा, कहाण्या सांगणे, हे काही लहानसहान हातोटीचे काम नव्हे. लहान मुलांना गोष्टी सांगण्यात कै. साने गुरूजी चांगले निष्णात असतं. ते गोष्टी सांगू लागले की सारी मुले त्यांच्या त्या हळुवार नि चित्तवेधी कथानकात अगदी तद्रूप होऊन डोलत असत.
रेवरंड डीन स्विफ्ट (ज. १६६७ मृ. १७४५) हे विनोदी, उपहासगर्भ आयरिश लेखक नि कथाकार, गोष्टी सांगण्याच्या सरावाबद्दल म्हणतात - "गोष्टी सांगणे साधेसुधे काम नव्हे. त्याला कसब लागते. हातोटी लागते. येथे जशी चतुराई हवी, तसा रसाळपणाही हवाच. त्याचबरोबर यथोचित हावभाव आणि अभिनयाची जोड नसेल, तर मात्र काही भागणार नाही. गोष्टी वेल्हाळ रंगात आल्यावर हे त्याला सहज साधते. चेहऱ्यामोहऱ्यावर थोडीशी गंभीरपणाची झाक असली का गोष्टी सांगण्याचे काम परिणामकारक झालेच म्हणून समजावे. पण हा काही सामान्य नियम मानता येणार नाही. अधूनमधून वरचेवर उल्हासी चेहरा आणि मिश्किल हावभाव यांची फोडणी द्यावीच लागते. मी आणखी एक पाऊल पुढे जाऊन म्हणतो की गोष्टी सांगणाऱ्यांच्या शरीराचे ठाणमाण आणि चेहऱ्यामोहऱ्याची ठेवण यांवरही गोष्टीचे यशापयश पुष्कळ अवलंबून असते."
अलीकडे जाहीर गोष्टी सांगण्याचा उपक्रम दादरच्या साने गुरूजी कथामालेने चालविला असून, तिच्या शाखा महाराष्ट्रभर ते काम करीत असतात. मोठ्यांचे कसब पाहून लहान मुलेही तेथे गोष्टी सांगतात. हा उपक्रम वक्तृत्वाला पोषक असाच आहे.
माझ्या लहानपणी गोष्टी सांगणारे फिरस्ते गावोगाव तो व्यवसाय करीत भटकत असत. प्राथमिक व माध्यमिक शाळांतून त्यांचे कार्यक्रम होत असत. हा व्यवसाय करणारे धंदेवाईक `गोष्टीवेल्हाळ` सध्या मात्र कोठेच आढळत नाहीत. गोष्टी सांगताना त्यातल्या निरनिराळ्या पात्रांची भाषणे, अगदी रंगभूमीवरील पात्रांसारखी, तद्रूप होऊन, निरनिराळ्या आवाजात वठविण्याची त्या गोष्टीवेल्हाळांची शैली आणि अभिनय, लहानमोठ्या श्रोत्यांना हा हा म्हणता तल्लीन करून सोडीत असत. एकच माणूस अनेक पात्रे असलेले नाटक रंगभूमीवर करून दाखवीत आहे, असाच भास निर्माण व्हायचा. अगदी नऊ रसांची बरसातच करायला म्हणा ना. वक्त्याला नाट्याची आवश्यकता फार असते. `जुन्या आठवणी` सांगतानाही वक्त्याने श्रोत्यांना अगदी त्या जुन्या काळाच्या गोष्टी आज आपण प्रत्यक्ष पाहत, अनुभवीत आहोत, असा रंग निर्माण करण्यातच खरी शहामत असते.
वक्तृत्वाचा अनेक रसरंगी वाग्विलास अंगी बाणू पाहणाऱ्या महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांनी गोष्टी, कथा, जुन्या आठवणी, प्रवासवर्णने रंगवून सांगण्याचा हा उपक्रम अगत्य करावा अशी शिफारस आहे. जाहीर व्याख्यानातही पुष्कळ नामांकित म्हटले जाणारे वक्ते जो कसला तरी एक हरदासी थाटाच सूर काढून त्या एकाच स्वरात आपले चऱ्हाट वळीत बसतात, त्यापेक्षा सहज आपुलकीने गोष्टी सांगण्याच्या धाटणीने वक्ता बोलेल, तर त्याच्या भाषणाचा परिणाम श्रोत्यांवर फार चांगला होईल.
उदाहरणदाखल रेव. बाबा पद्मनजी यांच्या `अरूणोदय` नामक आत्मचरित्रातल्या दोन गोष्टी (जुन्या आठवणी) देत आहे. बाबांची भाषा साधी बालबोध आहे. प्रत्येक गोष्टं त्यांना हृदयाच्या अगदी तळमळीने सांगितलेली आहे.
१) बुवाबाजीचे दोन नमुने
आमच्या गल्लीत मारूतीच्या देवळाखेरीज आणखीही काही धर्मसंबंधी प्रस्थे होती. एक तैलंग ब्रह्मचारी बहुत वर्षे एका सावकाराच्या घरी भाड्याने खोली घेऊन राहिला होता. त्याने नित्य मोठ्या पहाटेस (सुमारे ४ वाजता) उठून रस्त्यात "राधे गोविंद, गोविंद राधे" असे मोठ्याने म्हणत फिरावे, तेणेकरून लोकांची साखरझोप मोडून त्यांस बराच त्रास होत असे. त्या आळीत कोणी नवा मामलेदार आला म्हणजे त्याला तो त्रास न सोसून त्याने त्याचे ओरडणे बंद करण्याचा हुकूम करावा, तरी तो आपला क्रम सोडीत नसे. आमच्या घरच्या मनुष्यांस `देवाचे नाव` सकाळच्या प्रहरी कानी पडते म्हणून आनंद वाटत असे. दुसरे प्रस्थ एका वैष्णव ब्राह्मणाचे होते. तो सरकारी कामदार होता. त्याने देवाची पूजा फार माजविली होती.
दर शुक्रवारी पुष्कळ लोक त्यांच्या घरी पूजेस व प्रसादास येत. त्याच्या पूजेची भांडी बहुतेक चांदीची असून देव्हारा फार मोठा होता. त्याने पायात घागऱ्या बांधून व हातात वाणी घेऊन देवीपुढे नाचावे व गाणी गावी. पुष्कळ वैष्णव ब्राह्मण, भट, भिक्षुक व सरकारी कामदार ह्या पूजेला येत. मीही तेथे जात असे. ह्याने दोन अंगवस्त्रे बाळगली होती, त्याविषयी ब्राह्मणांस काही वाटत नसे! हा कमिसेरी खत्यात नोकर होता, त्याने सरकारचा पुष्कळ पैसा खाल्ल्याचा जेव्हा त्याजवर आरोप आला, तेव्हा तो तेथून पळून एका डोंगरात गोसावी बनून राहिला!
- बाबा पद्मनजी, `अरुणोदय` पान ३०
२) शंकाराचार्यांची पाद्यपूजा नि पुडी
बेळगावी शंकराचार्य आले म्हणजे ते बहुधा मारूतीच्या देवळात उतरत. श्रावणमासी त्यांचे तेथे राहणे झाल्यास कोटी शिवलिंगे करण्याचा धडाका चालायचा. स्मार्त ब्राह्मण ही लिंगे करण्याचा मखता घेत. ते सुपारी एवढाली लहान लहान लिंगे वस्त्रावर लावून ठेवीत. संध्याकाळी शंकाराचार्यांचा कारकून येऊन त्यांचे माप घेई म्हणजे इटांचे किंवा कवलांचे जसे माप घेतात तसे मोजून तो त्यास ठरविलेल्या दराप्रमाणे पैसे देई! ह्या कामात पुष्कळ पक्षपात व लबाडी होत असे. सर्व लिंगे मोजत नसत, चारी बाजूंच्या रांगेतील लिंगे व सर्व रांगा मोजून त्यांचे क्षेत्रफळ काढीत लिंग करणारे मधून मधून कमी लिंगांच्या रांगा लावीत. वैष्णव ब्राह्मणास ही लिंगपूजा अगदी आवडत नसे. पार्थिव (मातीचे लिंग) करणे व त्याचा विक्रय करणे व ते मोडणे हे महापातक आहे, असे ते म्हणत. बेळगावी बहुतकरून संकेश्वरचे शंकाराचार्य येत. त्यांचा इतमाम फार मोठा असे.
त्यास ३० गावांचे इनाम असून त्यांचे उत्पन्न ३० हजार रूपये आहे. शिवाय लोकांपासून जे मिळते ते निराळे. ते प्रतिवर्षी १० हजार ब्राह्मणभोजन घालतात. त्यांची पालखी आडवी चालते व तिच्याबरोबर दिवसा मशाली पेटविलेल्या असतात! ह्या `जगद्गुरूस` कोणी आपल्या घरी बोलविणे झाल्यास मोठया खर्चाचे काम असे. निदान शे-दीडशे रूपये तरी खर्च लागावयाचा. साधारण लोक दर्शनास जाऊन यथाशक्ती काही दक्षिणा त्यांस देत. आमच्या घरची माणसे त्यांच्या प्रसादास गेल्याची मला आठवण आहे. तेथल्या पोळ्या बाजरीच्या भाकरीसारख्या रटाल्या व भटाऱ्याच्या भाकरी एवढाल्या मोठ्या होत्या. पुरण वाटण्याबद्दल ते पायाने तुडवीत. स्वयंपाकाच्या चुलीऐवजी, मोठाले चर खणून त्याजवर लाकडांच्या फळ्यांप्रमाणे लांबट लोखंडी तवे टाकले होते. ह्या जेवणाची मी घरी आल्यावर चर्चा केली, तेव्हा स्वामीच्या प्रसादास नाव ठेवू नये असे मला सांगितले. भोजनसमयी दर पात्री एक एक रूपया आम्ही दक्षिणा दिली. त्याशिवाय आणखीही द्रव्य स्वामींपुढे ठेविले.
- बाबा पद्मनजी, `अरुणोदय` पान ३१
प्रकरण ११
मनोविकास
`विषय मोठा असो वा लहान असो, तो आकलण्याची शक्ती असलेले मनच काय ते वास्तववादी, कणखर आणि निकोप समजावे.`
-डॉ. जॉन्सन
येथवर कायिक वाचिक मुद्द्यांविषयी आपण विचार केला. आता मानसिक क्षेत्रातल्या आवश्यक मुद्दयांच्या महत्त्वाचा विचार केला पाहिजे. या मुद्दयांचा पद्धतशीर विकास, केवळ वक्तृत्वापुरताच नव्हे, तर सुखी आणि यशवंत जीवनाचा पाया भक्कम बसविण्यासही उपयोगी पडणार आहे. लोकशाहीच्या अमदानीत शीलवंत नागरिकांचे माहात्म्य बहुमोल असते. असलेच लोक लोकशाहीचे पांग फेडतात. `कॅरेक्टर- बिल्डिंग` म्हणजे शीलसंवर्धन हा विषयच सध्याच्या पिढीला पारखा झाल्यासारखा दिसतो. त्या दिशेने विद्यार्थ्यांचा मनोविकास कसकसा व्हावा, याचे विवरण येथे करीत आहे.
१) कळकळ आस्था
सध्या जगात अविचाराची आणि कुविचारांची जी भुताटकी माजली आहे. त्यात कळकळीचा अभाव हे भूत अतिशय भयंकर होय. एकमेकांबद्दल कोणाला आस्था नाहीच नाही, पण स्वतःबद्दलही ती नाही. अनेक भयंकर सामाजिक उत्पातांचे मूळ येथेच आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांची आस्था नाही. शिक्षकांना विद्यार्थ्यांची नाही. लोकनेत्याला लोकांची नाही. अनुयायांना पुढाऱ्यांची नाही. वक्त्यांना विषयाची नाही. व्यापाऱ्यांना प्रामाणिकपणाची नाही. कलावंतांना कलेची नाही आणि लेखकांना साहित्याची नाही. प्रत्येक सद्गुणाचा पाया आस्थेवर उभा असतो. हृदयात आस्थेची तळमळ उकळू लागते, तेव्हाच मनुष्याच्या सुप्त हिंमतीच्या साऱ्या शक्ती उफाळून बाहेर येतात. आस्था नाही, कसल्याही विषयाची कळकळ नाही, असली माणसे अर्धवट, भंगलेले आणि लंजूर जीवन जगत असतात.
बेटर्टन नावाच्या एका नटाला लंडनच्या बिशपने विचारले, "काय हो, निव्वळ काल्पनिक पात्रांच्या भूमिका वठवून प्रेक्षकांना तुम्ही कधी रडविता, तर कधी हसविता, कधी इतके प्रक्षुब्ध करता की ते बंडसुद्धा करायला उठतात आणि नाटक म्हणजे विशेष घटनेचे अथवा प्रसंगांचे त्रयस्थांनी वठवलेले काल्पनिक चित्र, हे त्यांना खासखुस माहीत असूनसुद्धा ते रंगभूमीवर दर्शविलेल्या सुधारणा आपखुशीने राजकीय नि सामाजिक क्षेत्राचा घडवून आणण्याचा एकदिलाने प्रयत्न करतात, याची खरी मक्खी तरी कशात आहे?" त्यावर त्या सुप्रसिद्ध नटाने दिलेले उत्तर वक्तृत्वाच्या विद्यार्थ्यांनी नीट लक्षात ठेवण्यासारखे आहे. बेटर्टन म्हणाला - "लॉर्डसाहेब, यांचे कारण आम्ही नेहमी आमच्या कामात आसक्तचित्त असतो. तुम्ही सत्याचे प्रतिपादन कादंबरीच्या धाटणीने करता आणि आम्ही कांदबऱ्यांचे प्रतिपादन सत्याच्या धाटणीने करतो, इतकाच काय तो फरक."
कोणत्याही विषयाची, कार्याची अथवा समाजकल्याणाची निर्मळ आस्था मनुष्याला असली, म्हणजे तो दिसला, बोलू लागला किंवा काही करू लागला का ती त्याच्या चेहऱ्यावर, प्रत्येक हालचालीवर चमकताना दिसते. कळकळीच्या वक्त्याला वक्तृत्वाचे धडे घ्यावे लागत नाहीत. त्याच्या हावभावात, शब्दाशब्दात आणि स्वरोच्चारात तिचे प्रतिबिंब पडते. तो पट्टीचा वक्ता नसला तरी मोठमोठ्या पट्टीच्या वक्त्यांनाही आपल्या आस्थेवाईक, मधुर परंतु ठोसर वाणीने गप्प बसवल्याशिवाय राहणार नाही.
कळकळीच्या माणसालाच सत्याची चाड असते. इंग्लंडचे सुप्रसिद्ध मुत्सद्दी वक्ते एडमण्ड बर्क, फॉक्स आणि शेरिडन यांची नावे भारतीय इतिहासात आदराने नमूद झालेली आहेत, ती त्यांच्या ह्या विशेष गुणांमुळेच. हिंदुस्थानच पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज ह्याने येथील राजेरजवाड्यांवर अतोनात जुलूम केला आणि त्यांच्या तिजोऱ्या लुटून आपले घर भरले. अयोध्येच्या बेगमांच्या छळाने तर हेस्टिंग्जने माणुसकीच्या तोंडाला काळे फासले. त्या वेळी इंग्रज लोक जोरावर होते. हिंदुस्थानात त्यांनी काय वाटेल ते घातपात नि अत्याचा केले तर त्यांचा हात धरणार कोण होता? अशा वेळी केवळ मानवतेच्या आणि न्यायाच्या कळवळ्याने एडमण्ड बर्फ उफाळून उठला. त्योन हेस्टिंग्जवर फिर्याद ठोकली आणि ब्रिटिश लोकसभेत त्याला चौकशीसाठी खेचला. बर्कच्या जोडीला फॉक्स, शेरिडन आणि सर फिलिप प्रान्सिस हे आणखी तिघे उभे राहिले. हेस्टिंग्जच्या आरोपांचा तक्ता वाचताना बर्कने जे पहिलेच मोठे आणि दणदणीत भाषण केले, ते ऐकून हेस्टिंग्ज पिंजऱ्यात बेशुद्ध पडला.
"छे छे छे! बर्कचा तो भयंकर भडीमार ऐकल्यावर माझ्याइतका काळ्याकुट्ट राक्षसी करणीचा नराधम जगात दुसरा कोणी नसेल, असे वाटून माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला नि माझी शुद्धबुद्ध हरपली." अशी हेस्टिंग्जनेच कबुली दिली. काशीचा राजा चेतसिंग याचे राज्य हेस्टिग्जने अनन्वित अत्याचार नि बलात्कार करून कसे हिसकले, ह्यावर फॉक्सने, अस्सल मानवतावादी कळकळीच्या वाग्यंत्राचा भडिमार केला. पण या दोन्ही वक्त्यांवर कडी केली शेरिडनने. अयोध्येच्या बेगमांवरील अमानुष अत्याचारांचा शेरिडनने इतक्या तळमळीने तपशीलवार स्फोट केला की सारे सभागृह हादरलेआणि श्रोते चित्रासारखेतटस्थ बसले. मनोवृत्ती प्रक्षुब्ध झाल्यामुळे कोणाच्या तोंडून शब्दही निघे ना. जागतिक वक्तृत्वाच्या इतिहासात शेरिडनच्या या भाषणाइतके अजरामर कीर्तीचे दुसरे व्याख्यान झालेच नाही.
हेस्टिंग्जला पार्लमेण्टपुढे खेचण्यासाठी हिंदुस्थानने त्या तिघांना काय वकीलपत्र दिले होते? त्यांचे खिसे काय मोहरांनी भरले होते? साधीसुधी तक्रार तरी त्यांच्यापर्यंत नेली होती काय? काही नाही. केवळ इकडच्या क्लाइव, हेस्टिंग्ज प्रभृति लुटारूंच्या जुलूम जबरदस्तीच्या बातम्या लंडनपर्यंत गेल्या मात्र आणि बर्क, फॉक्स, शेरिडन प्रभृति जिवंत कळकळीच्या मानवतावादी महात्म्यांना त्याची तात्काळ चीड आली आणि ते सत्याची चाड राखण्यासाठी उफाळून उठले. तब्बल सात वर्षे त्यांनी हेस्टिंग्जला चौकशीच्या चरकात आरपार पिळून त्याच्या जुलमी जीवनाची चिपाडे करून टाकली. लो. टिळक काय किंवा महात्मा गांधी काय, तसे म्हटले तर मोठे पट्टीचे वक्ते होते, असे मुळीच म्हणता येणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू याच वर्गातले. पण आपापल्या कार्याबद्दल, ध्येयाबद्दल आणि लोकहिताबद्दल तिघांच्या भावना इतक्या निस्सीम तळमळीच्या, की लोकांनी त्यांना नुसते पाहिले पुरे, का तो लोकसमूहही त्या तळमळीच्या प्रभावाने नखशिखांत भारला जायचा. त्यांचा आत्मा लोकांत मिसळायचा आणि लोक त्यांच्या आत्मतेजात समरस एकरूप व्हायचे.
एकीकडे अण्वस्त्राचे साठे करून जागतिक महायुद्धासाठी वखवखलेली पंचखंड दुनिया आणि समोर एकटे जवाहरलाल नेहरू जागतिक शांतीचा अट्टाहास करणारे. अशाही परिस्थितीत अमेरिका- रशियासारखी जबरदस्त राष्ट्रे, नेहरूंच्या एकेका शब्दाने हादरत होती, बाचकत होती, आश्चर्य करीत होती. हा कशाचा प्रभाव? पंडितजींच्या ध्येयाच्या आत्यंतिक तळमळीचा! जागतिक शांती आणि तज्जन्य मानव्याची सेवा, जवाहरलालजींच्या रोमारोमात अपरंपार संचारलेली असे. तिच्या कंपाच्या लहरी (vibrations) जागतिक राजकारणाच्या वातावरणाला सर्द गरम करीत होत्या. ध्येयनिश्चितीचा आणि तिच्या कळकळीचा केवढा हा पराक्रम!
आंग्लायी राजवटीचे पोलादी साखळदंड वाणीकरणीला जखडबंद पडले असताना, `स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच मिळवणार,` ही लोकमान्यांची आरोळी आणि चले जाव, भारत छोडो, ही महात्मा गांधींची डरकाळी, हेच शिकवते की व्यक्ती आणि आस्था एकवटल्या का हवी ती क्रांती घडविता येते, नव्हे, ती घडतेच.
२) एकाग्रता (कॉन्सेण्ट्रेशन)
हा विषय म्हटला तर कठीण आहे, म्हटला तर सोपा आहे. एका वेळी एकाच गोष्टीवर विचारांना केंद्रित करणे म्हणजे एकाग्रता साधणे. आपली चित्तवृत्ती एका वेळी एकाच बिंदूवर काही थोडे क्षण का होईना, टिकून राहिली आहे, असे सहसा घडत नाही. पाऱ्याला आपण चंचल म्हणतो, पण माणसाचे मन पाऱ्यापेक्षा नि वाऱ्यापेक्षाही महाचंचल. वेळी वाऱ्याची मोट बांधता येईल. (गलबताची शिडे ते काम करतात.) पण मनाला आवरणे फार कठीण. मानवी मनाच्या चवचालपणाचे, कवियत्री (कविवर्य श्री. सोपोनदेव चौधरी ह्यांची दिवंगत मोतोश्री) बहिणाबाईने रेखाटलेले शब्दचित्र, वाङ्मय सृष्टीत अनन्यसामान्य असेच गणले जाते म्हणून मुद्दाम ते येथे देत आहे. भाषा अहिराणी आहे, तरी वाचकांना ती समजण्यासारखी आहे.
(वढाय-ओढाळ, वाहादन-वावटळ, ईज-वीज, खाकस-खसखस, यवगी-योगी, सपन-स्वप्न, आभाय-आभाळ)
मन वढाय वढाय उभ्या
पिकातले झेर
किती हांकला हांकला
फिरी येतं पिकावर ।।१।।
मन मोकाट मोकट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वाऱ्याने चालल्या
पान्या वऱ्हल्यारे लाटा ।।२।।
मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन?
उंडारले उंडारले
जसे वारा वाहादन ।।३।।
मन लहरी जहरी
याच न्यारं ते तंतर
आरे इचू साप बरा
त्याले उतारे मंतर ।।४।।
मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात ।।५।।
मन चप्पंय चप्पय
त्याले नही जरा धीर
तटे व्हईसनी ईज
आलं आलं धर्तीवर ।।६।।
मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं
त्यांत आभाय मायेना ।।७।।
देवा, कसं देलं मन
आसं नाही दुनियात
असा कसा रे यवगी
काय तुझी करामत ।।८।।
देवा, आसं कसं मन
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तूले
आसं सपन पडले ।।९।।
तरीही अखंड प्रयत्नाने काय साध्य होणार नाही? अनंकांना जे साधलं, ते तुम्हालाही साधेल. जोड्यात खिळा ठोकताना चांभाराला एकदा पहा. डाव्या हाताच्या एका बोटाने नि अंगठ्याने खिळा धरून `जेमतेम` तो ताठ उभा राहील अशा बेताने त्याचे टोक तो चामड्यात रुतवून देतो. `जेमतेम` म्हणण्याचे कारण, किंचित धक्क्यानेही तो निसटण्याचा संभव असतो. नंतर उजव्या हातातील हातोडीचा फटका नेमका त्या खिळाच्या माथ्यावर पडला रे पडला का खिळा जाम आत जाऊन चामड्यात रूतून बसतो. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा या इंद्रियांमार्फत जे जे विकार मनावर होतात आणि तात्काळ त्यांना विचारांचे रूपही येते, त्यातूनच कल्पना निर्माण होते. प्रथम तिची अवस्था चांभाराच्या त्या लंजूर उभ्या खिळ्यासारखीच असते. पण एकदा का `लक्ष्य` रूपी हातोडीचा टोला तिच्यावर नेमका बसला, का झालीच ती आपल्या स्मरणात कायम स्थिर.
डॉ. मिसेस बेझण्टबाईंनी आपल्या विचार-सामर्थ्य (थॉट पॉवर) ह्या पुस्तकात एकाग्रता साधण्याचा जो मार्ग दाखविला आहे, तो असा -"विषय भाविक असो या बौद्धिक असो, त्यावर चिंतन करीत असता, पुष्कळ वेळा एकाग्रतेच्या पकडीतून तो निसटतो. कितीही वेळा असे घडले आणि तसे घडणारच-तरी त्याला परत खेचून आणून एकाग्रतेला स्वाधीन केला पाहिजे. कित्येक वेळा तर असे घडते की, मूळ विषय एकाग्रतेचा चकवून आपल्या जागी भलत्याच विषयाला बसवून केव्हा पसार होतो, त्याची चिंतन करणाराला दादही लागत नाही. मूळ विषय बाजूला राहून आपण भलत्याचे मुद्द्यावर गुंगलो आहोत, हे चिंतन करणाराला पुष्कळ वेळाने उमगते. लगेच शुद्धीवर येऊन, तो मूळ मुद्दयाला खेचून परत आणतो. प्रयत्नांची ही पद्धत त्रासदायक आणि कंटाळवाणी तर खरीच, पण एकाग्रता साधायला दुसरा सोपा राजमार्ग नाही."
ह्या बाबतीत अलेक्झांडर हॅमिल्टन या सुप्रसिद्ध वक्त्याचा अनुभव डोळ्यापुढे ठेवण्यासारखा आहे. तो म्हणतो "लोक माझ्या बुद्धिमत्तेची फार तारीफ करतात. पण माझ्या साऱ्या बुद्धिमत्तेचे मर्म एकाग्रतेत आहे. मी एखादा विषय हाती घेतला का आधी त्याचा सपाटून सांगोपांग अभ्यास करतो. रात्रंदिवस मग त्या विषयाशिवाय दुसरे कोणतेही नि कसलेही विचार डोक्यात येऊ देत नाही. त्यसाच्या सर्व बारीकसारीक भेदांचे मी सूक्ष्म निरीक्षण आणि शोधन करण्यातच मग्न असतो. माझे मन त्या विषयाने इतके दाट भरून जाते की मी आणि तो विषय अगदी एकतान, एकजीव व समरस होतो. नंतर त्या विषयाचे प्रतिपादन करण्यासाठी घरातल्या घरात तालमीवर तालमींचा मी जो एकतान खटाटोप करतो, त्यालाच लोक माझी `बुद्धिमत्ता` समजतात. वास्तविक एकाग्रचित्त अखंड सायासाचेच ते फळ असते."
नेपोलियन बोनापार्टची गोष्ट सांगतात. तो अभ्यासाच्या दालनात असो, नाहीतर प्रत्यक्ष रणधुमाळी चाललेल्या रणांगणावर उभा असो, हव्या त्या मुद्दयावर, घटनेवर अथवा डावपेचावर तो हजरजबाबी सल्ला देत असे. हे कसे घडते? असे एकदा त्याला विचारले असता, तो म्हणाला - "माझ्या मनाच्या कपाटाला प्रत्येक विषयासाठी एकेक खण आहे. ज्या वेळेला ज्या विषयाची जरूर असेल तेव्हा पटकन भी तो खझ उपडतो आणि उघडा असेल तो मिटतो. बस्स. कोणत्याही वेळी फक्त एकच खण उघडलेला असतो. बाकीचे सारे बंद." शत्रूच्या एकाच नाजूक व्यंगावर आपल्या सर्व युक्त्याप्रयुक्त्यांचा जोरकस भडीमार करून त्याला चीतपट करण्याची नेपोलियनची युद्धशैली त्याच्या असामान्य एकाग्रतेचा पुरावा होय.
ग्लॅडस्टनचा मृत्यू झाल्यावर पार्लमेंटने बोलावलेल्या शोकसभेत लॉर्ड रोजबरी म्हणाले - "ग्लँड्स्टनच्या मनोवृत्तीचा उळक दाखला म्हणजे त्यांची जबरदस्त एकाग्रतेची शक्ती हा होय. वाटेल त्या वेळी, वाटेल त्या विषयावर, यत्किंचितही कांकू न करता, त्या विषयाची परिपूर्ण शहानिशा करण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा सारा साठा नि जोर एकदम खर्ची घालण्यास तयार असलेला त्यांच्यासारखा एकाग्र चित्ताचा मुत्सद्दी दुसरा दाखविता येणार नाही."
एकाग्रतेची ही विलक्षण सिद्धी जवाहरलाल नेहरूत पाहायला मिळते. विशाल भरतखंडाचे पंतप्रधान या नात्याने दररोज हरघडी त्यांना शेकडो विषय हाताळावे लागत. देशी-परदेशी पेचप्रसंगांचे हजारो मामले गर्दी करून त्यांच्यापुढे उभे असत. नुसते उभे असत असे नव्हे, तर त्यांची आडवीतिडवी कोडी चुटकीसरशी सोडवावी लागत. सोडवणुकीचे शब्द काटेतोल मोजून वापरावे लागत. दिवसाच्या ३-४ तास झोपेशिवाय बाकीचा वेळ ती पेचप्रसंगांची गणिते सोडविण्यात मग्न असत, आणि ती ते इतक्या एकाग्रचित्त शहामतीने सुटसुटीत सोडवीत, का आलेले उत्तर जागतिक पट्टीच्या मुत्सद्द्यांनाही डोकी खाजवायला लावण्याइतके तितकेच आडाखेबाज असे.
मनुष्य एकदा एखाद्या गोष्टीत एकतानता पावला का तो आपल्या आजूबाजूच्या इतर सर्व परिस्थितीला पार विसरून जातो. एका इंग्रज मुत्सद्द्याची गोष्ट सांगतात. पार्लमेंटमध्ये एका विषयावर खडाजंगी वाद चालू होता. ही स्वारी तर आपल्या उत्तरादाखल द्यावयाच्या मुद्दयात इतकी गढून गेली होती, का वेळ संपल्याने सभा आटोपल्यावर जी तडक उघडी बोडकी (टोपीशिवाय) निघाली, ती भर पावसात चिंब भिजत थेट घरी आली. पण आपली टोपी पार्लमेंटगृहातच राहिली आणि आपली घोड्याची गाडी दरवाजाजवळ उभी होती, याचे त्याला भानही राहिले नव्हते. इतका तो आपल्या विषयात एकाग्रचित्त तल्लीन झालेला होता.
हा सारा दीर्घाभ्यासाचा परिणाम आहे. करील त्याला साधतो. आजवर जे जे वक्ते आणि मुत्सद्दी नामांकित झाले, ते सारे अदम्य उद्योग आणि अविश्रांत श्रमांचे तपस्वीच होते. वक्तृत्वात लोकोत्तर प्रावीण्य मिळविण्यासाठी, रात्र बेरात्र, वेळ- अवेळ न पाहता, अभ्यासाची ते कमाल शिकस्त करायचे. निरीक्षण, चिंतन, लेखन, वाचन आणि पठण यांचा व्यासंग अहोरात्र चालूच असायचा. व्याख्याने लिहून काढणे, ती सुधारणे, पुनःपुन्हा ती मोठ्याने `बोलणे`, पुन्हा सुधारणे, हा त्यांचा क्रम सारखा चालू राहिल्यामुळेच त्यांना मोठमोठ्या राष्ट्रीय घडामोडींच्या विश्वकर्म्याचा मान लाभला.
शील परं भूषणम्
इंग्रजीत ज्याला आपण `कॅरेक्टर` म्हणतो, त्याला शील हा प्रतिशब्द योजीत असेल तरी या प्रतिशब्दात कॅरेक्टरपेक्षा आणखी बऱ्याच अर्थछाया आहेत. "संपत्ती गेली, तरी काहीही नुकसान होत नाही. शारीरिक आरोग्य गेले, तर थोडेसे नुकसान होते, पण शील गेले, तर सर्वनाश!” अशी एका तत्त्वज्ञाची उक्ती आहे. समाजाच्या साऱ्या आशाआकांक्षा व्यक्तिमात्राच्या शीलावर असतात. मानवी मनोविकास अंतर्यामातून बाहेर प्रगट होत असतो. बुद्धीची वाढ एकांतवासात होत असते आणि संसाराच्या नि व्यवहाराच्या उलटसुलट तुफानी लाटांशी टकरा देण्याने शीलाची वाढ होत असते. जगात मनुष्याला दोनच भूमिका प्राप्त होत होतात. एक तर तो ऐरण असेल, अथवा हातोडा असेल. (लाँगफेलो.) म्हणजे टोले खाणारा असेल किंवा टोले देणारा असेल. ज्याचे शील कच्चे, तो टोलेच खाणार आणि पक्क्या शीलाचा टोले देणार. विवाहसंबंध जुळविताना आपण नेहमी घराणे ‘कुलशीलवान` आहे किंवा कसे, याच मुद्द्यावर विशेष जोर देतो.
मनुष्य बुद्धिवंत असला आणि शीलवंत नसला, तर त्याच्या बुद्धिमत्तेची व्यवहाराच्या बाजारात किंमत फुटकी कवडी. वक्ता किंवा पुढारी प्रसंगी मोठा बुद्धिवंत नसला आणि पक्का शीलवंत असला तरी चालतो. लोक त्याच्या शीलाचा आदर राखतात. पण तोच तर पुष्कळ बुद्धिवान पण शीलभ्रष्ट असेल, तर त्याची ते कदर राखणार नाहीत. असला वक्ता व्यासपीठावर आपल्या बुद्धिवैभवाची नि वाग्विलासाची किती का कसरत करी ना, त्याचा लोकांच्या मनावर परिणाम होत नाही. घटकाभर करमणूक म्हणून त्याचा शब्दिक जादूचा खेळ ते पाहतात, त्याच्या विनोदाला चुटक्यांना नि कोट्यांना टाळ्या देतात, खोकाटाची खसखस पिकवितात आणि रिकाम्या डोक्यानी घरोघर जातात.
मि. हेन्री वॉर्ड बीचर यांनी आपल्या `येल लेक्चर्स ऑन प्रीचिंग`मध्ये (प्रवचने कशी करावी यावरची व्याख्याने) म्हटले आहे- "वक्ता, उपदेशक, पाद्री, मिशनरी म्हटला म्हणजे तो अंतर्बाह्य अगदी नमुनेदार माणुसकीचा मनुष्य असला पाहिजे. त्याने नुसते विरक्त राहून उपयोगी नाही, तर दया, औदार्य, मनाचा थोरपणा, शांत वृत्ती, मधुर वाणी यांनी परिपूर्ण असला पाहिजे. आत्मसंरक्षणापुरती त्याने क्रोधाचीही तयारी ठेवली पाहिजे. तो बहुश्रुत आणि उत्कृष्ट ज्ञानाचा अभ्यासू संग्राहक असावा. तुम्हाला जर वक्ता म्हणून लोकप्रिय व्हायचे असेल, तर सर्वसाधारण सामान्यांच्या शील आणि संस्कृतीपेक्षा तुमच्या शीलाची नि संस्कृतीची उंची बरीच अधिक असली पाहिजे."
बेंजामिन फ्रांकलिनचा आपल्या शीलावर कमाल भरवसा असे. हॅबनने त्यांच्याविषयी म्हटले आहे- "सुप्रसिद्ध उद्यमप्रिय गृहस्थ बेंजमिन फ्रांकलिन याने देशोद्वाराच्या शेकडो सार्वजनिक कामात वक्ता या नात्याने जे यश संपादन केले, त्याचे श्रेय आपल्या बुद्धिमत्तेला अगर वक्तृत्वशक्तीला न देता, ते त्याने आपल्या शीलाच्या अभेद्य पावित्र्यालाच दिले आहे. बेंजामिन म्हणत असे की, `माझ्या नागरिक बंधूंवर माझे जे इतके वजन पडत असे, याचे कारण फक्त माझे शील. माझ्यासारखा भिकार वक्ता मीच. अस्खलितपणा तर मला ठाऊकच नाही. शब्दांची योजना करण्यासाठी, हे बोलू का ते बोलू, अशा अशा काचरणीची धडपड सारखी चालू असे. धड व्यकरणशुद्ध भाषाही मला बोलता येत नसे. पण काय असेल ते असो, माझे उद्देश श्रोत्यांच्या हृदयावर बिनचूक उमटत आणि ते त्यांना निःशंक पटत."
रशियाचा पहिला बादशहा अलेक्झांडर याच्याविषयी अख्यायिका आहे की, दहा-पंधरा डोकेबाज मुत्सद्द्याचे मंत्रिमंडळ आणि त्याचे शील जर तराजूत घातली, तर अलेक्झांडरच्या शीलाचेच वजन अधिक ठरत असे. फ्रोण्ड येथील युद्धे चालली असताना, आपल्या किल्ल्याचे दरवाजे सताड उघडे ठेवून राहणाऱ्या फ्रेंच सरदार मॉण्टेनविषयी लौकिक आहे की, त्याला आपल्या शीलापुढे घोडेस्वारांच्या पलटणीचीही दिक्कत वाटत नसे.
अनुयायांपेक्षा लो. टिळकांच्या मतांचे नि धोरणांचे विरोधक महाराष्ट्रात अनेक होते. त्यांनी शेकडो प्रसंगी टिळकांशी विरोधाच्या झटापटीही केल्या. पण त्यांच्या शीलाकडे चुकूनही कधी अंगुलीनिर्देश करण्याची कोणाचे छाती झाली नाही. लोकमान्य टिळकांचे शील महाराष्ट्राची पोलादी ढाल होती. ज्या ब्रिटिश मुत्सद्दयांनी राजकारणी सबबीवर त्यांच्या हयातभर छळ केला आणि राजद्रोहाच्या मुद्दयांवर त्यांच्यावर अनेक खटले भरले नि शिक्षा ठोठावल्या, ते सुद्धा लोकमान्य टिळकांच्या शीलाचा प्रश्न येताच आदराने माना खाली घालत असत. त्यांना अखेरची सहा वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावणाऱ्या दावर न्यायमूर्तीने आरोपपत्रकात कितीही अद्वातद्वा मुद्दे काढले, तरी तरी त्यानेच टिळकांच्या शीलाचा आदरयुक्तच उल्लेख केलेला आहे.
"लोकमान्यांचे नि माझे राजकारणी मतभेद कितीही असले तरी त्यांच्या निष्कलंक चारित्र्याला (स्पॉटलेस कॅरेक्टर) प्रणामासाठी माझा माथा नेहमीच आदराने खाली वाकलेला राहील." लोकमान्यांच्या दहनभूमीवर महात्मा गांधींनी काढलेले हे उद्गार लक्षात ठेवण्यासारखे आहेत. सारांश, शील हे केवळ परभूषणच काय, पण मनुष्याच्या जीवनाचा एक तेजस्वी पुरावा म्हणूनच सर्वत्र पूजला जात असतो. "पूर्व ती पूर्व आणि पश्चिम ती पश्चिम. दोन्ही कधीही एकवटणे शक्यच नाही." या अर्थाची रुडयार्ड किप्लिंगची कविता समग्र वाचली म्हणजे अखेरच्या ओळीत त्यानेही हा शीलाचा मुद्दा कसा बिनतोड पुरस्कारलेला आहे, हे पाहण्यासारखे आहे
Oh East is East and West is West,
And never the twain shall meet,
Tell earth sky standpresently,
at God, great judgment sent,
But there is neither east nor west
border nor breed nor births
When two strong men standface to face
though they come from the ends of the earth
आकाश पाताळ एक होईपर्यंत जरी पूर्व ती पूर्व आणि पश्चिम ती पश्चिम राहिली, तरी दोन `स्ट्रॉग मेन` सच्छील मर्द, पृथ्वीच्या कोठल्या का टोकाहून आलेले असोत, समोरासमोर भिडले की सीमा, वंश, जन्मभेदाच्या रेषाच तात्काळ पुसल्या जातात, असते. तेथे वाद घालायला पूर्व जागेवर नसते आणि पश्चिमही बेपत्ता असते.
प्रकरण १२
आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व
"ज्यांची यशाबद्दल खात्री असते, तेच यशवंत होतात."
- ड्रायडन
मनोविकासाचा परिणाम आत्मविश्वासाच्या कमावणीत होतो. तो एकरंगी नसून इंद्रधनुष्यासारखा अनेकरंगी असतो. बौद्धिक आत्मविश्वास, शारीरिक आत्मविश्वास, सामाजिक आत्मविश्वास आणि वक्तृत्वाविषयी आत्मविश्वास, हे त्याचे चार ठळक विभाग आहेत. अनेक विषयांचे खूप अध्ययन केले, तरी कित्येकांना आपल्या बुद्धिसामर्त्यांचा विश्वास वाटत नाही. कित्येकांना आपल्या शारीरिक आरोग्याची खात्री नसते. काहींना समाजात येऊन निश्चयाने चार शब्द धडपणे बोलण्याची हिंमत होत नाही. त्यांचा सामाजिक आत्मविश्वास लंजूर असतो. ज्ञान खूप मिळविले, पण आजूबाजूचा समाज ही काय चीज आहे, ह्याचा कित्येकांनी आधी काही विचारच केलेला नसतो. पदवीधर, विद्वान म्हणून सभास्थानी उभे राहिले तर ५०० लोकांचे हे हजार डोळे मला आता खाणार का गिळणार, असल्या विचित्र भीतीने ते गांगरून जातात. म्हणजे, आत्मविश्वासाच्या कमावणीला भय, भीती हे एक मोठे कुपथ्य आहे.
भीती हा काय बागुलबुवा आहे?
"आपल्याला कशाची जर भीतीच बाळगायची असेल तर ती फक्त भीतीचीच." १९३३च्या आपल्या पहिल्याच अध्यक्षीय भाषणात फ्रांक्लिन रुझवेल्ट असे बोलले होते. खरे म्हटले तर निष्कलंक मोकळ्या मनोवृत्तीला कशाचेही भय वाटताच कामा नये. युद्धाच्या पहिल्याच झटापटीत शौर्य गाजवून परतलेल्या एका शिपायाला विचारले की, `काय रे, तुला समरांगणाचा देखावा पाहून, भीतीबिती काही वाटली नाही का रे?` तो म्हणाला, "मला भीती वाटली का मला भीती वाटेल; पण मला मुळीच भीती वाटली नाही." या उद्गारांतील भीतीचे स्वरूप चोख नि स्पष्ट आहे. एखादे नीच फसवेगिरीचे दुष्कृत्य करताना, दुसऱ्याला अपाय करताना, क्षुद्र स्वार्थासाठी एखाद्याचा घात करताना वास्तविक आपले मन कचरले पाहिजे, भीती वाटली पाहिजे, अशा प्रकारची भीती आपल्या शीलाचे सामर्थ्यच वाढवते.
भय वाटण्याच्या गोष्टीची यादी केली, तर ती जितकी हास्यास्पद होईल, तितकीच मनोरंजकही वाटेल. कित्येकांना दारिद्र्याची भीती. काही काळोखालाच भितात. लोक माझी निंदा तर करीत नसतील ना? ह्यानेच कित्येक भयग्रस्त असतात. हवेत फिरणारे अदृश्य जीवजंतू (जर्म्स), रस्त्यात कुत्री, चोरांची धाड, हिवताप, एकांतवास, वकील, मरणाची धास्ती, भूतबाधा, असल्या गोष्टीची कित्येकांनी हैबतच घेतलेली असते. शुक्रवार आणि १३ चा आकडा यांनीच कित्येकांना आकड्या येऊ लागतात. फार काय, पण काहीना लग्नाची भीती वाटते. परीक्षेची सुरुवात शुक्रवारी असली का कित्येक विद्यार्थ्यांचे कंबरडेच खचते. एका विद्यार्थ्याचे तर चमत्कारिक उदाहरण मी पाहिले आहे. तो गणित विषयात कच्चा असे. कच्चा असण्याचे कारण, गणित आणि आकडे म्हटले की तो भेदरायचा. इतर विषयात अगदी पहिला नंबर. पण गणिताच्या परीक्षेच्या वेळी मंडपात गेला रे गेला, का त्याला हिवतापाची हुडहुडी भरून परतलाच तो घरी याशिवाय, मांजर आडवे जाणे, उंदीर दृष्टीला पडणे, स्वप्न पडणे आणि ग्रहमान प्रतिकूल असणे, इत्यादी क्षुल्लक गोष्टींनीही विनाकारण आपली हिमत आणि बुद्धी करपवणारे लोक आहेत.
अनेक वृत्तपत्रांत अलीकडे बरीच वर्षे नियमाने प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक आणि मासिक किंवा वार्षिक भविष्याने तर समाजात भीतीचा एक भयंकर प्लेगच फैलावलेला आहे. अमूक दिवशी तमूक राशीच्या लोकांना रस्त्यात चालताना अपघाताची भीती आहे. एवढे भविष्य वाचले असले पुरे का स्वारीने नोकरीलाही टाळा द्यायचा. अनेक परिश्रमांनी पिकवून ठेवलेले यशाचे फळही तोडायला त्या दिवशी बाहेर पडणार नाही. अशा भेदरट लोकांची संख्या वाढती रहाणे, हे एक राष्ट्रीय संकट आहे. तुर्कस्तानचे पुनरुज्जीवन करताना, अतातुर्क केमालपाशाने ज्या अनेक सुधारणा प्राणदण्डाच्या दहशतीने अंमलात आणल्या, त्यात रमल ज्योतिषांची तुर्कस्तानातून कायमची हकालपट्टी, ही एक महत्त्वाची नि आवश्यक बाब होय.
फलज्योतिषाने शेकडो बुद्धिवंतांच्या बौद्धिक आत्मविश्वासाला कायमची कीड घातल्याचे पाप केले आहे. दैव वाकडे चालू लागल्याची भीती बोकांडी बसली, का माणूस देव शोधू लागतो. त्यातूनच साधुसंतांच्या बुवाबाजीला ऊत येतो. ख्रिस्तपूर्वं प्राचीन ओस देशातल्या स्टॅटियस नावाच्या तत्त्ववेत्त्याने म्हटले आहे की, "माणसाच्या मनात ज्या क्षणाला भीतीचा पहिला अंकुर फुरफरला, नेमक्या त्याच क्षणाला जगात देव ही चीज पैदा झाली." देवाचा बडेजाव माजवण्यासाठी त्यावर एक अधिक मात्रा देऊन, माणसानेच देव पैदा केले. केवळ मात्रांच्या अदलाबदलीनेच पोकळ डोक्यांची माणसे देव दैवाचा उकिरडा फुंकीत असतात. सारांश, उद्या आपल्यावर काहीतरी वाईट बेतणार आहे, अशा केवळ कल्पनेने मनाला येणारी हकनाहक अस्वस्थता म्हणजे भीती, यापेक्षा त्यात काही विशेष नसते.
भीती दाखवणाऱ्या गोष्टीच्या तोंडावरच निधड्या छातीने चाल करून गेले. का तिच्या नांग्या आपोआपच मोडतात. शुक्रवारी हाती घेतलेले काम तडीला जात नाही? ठीक आहे. आजपासून प्रत्येक नव्या कामाचा श्रीगणेशा मी बिनचूक शुक्रवारीच करणार, अशा निश्चयाने मनात जोर धरला, का काही वाकडे होत नाही. कार्याचे यशापयश माणसाच्या चातुर्ययुक्त परिश्रमावर असते. तेथे देवाची कृपा नि दैवाची खैर यांची काही जरूरच नसते. माणसाने प्रथम उंट जनावर पाहिले, तेव्हा त्याचे ते अकटोविकटो विद्रूप पाहून तो भेदरला. पण थोड्याच वेळाने मनाचा हिय्या करून तो त्याच्या अगदी जवळ गेला. पाहतो तो तो प्राणी अगदीच गरीब नि अजागळ!
स्वारीने लागलीच छाती करून, त्याच्या तोंडात लगाम अडकवली आणि आपल्या पोराला त्याच्यावर बसून रिंगणात फिरवला. याच पद्धतीने मनाला जोडलेल्या भीतीच्या सगळ्या गोष्टी जिंकून, त्यावर प्रभुत्व गाजवला येते. या बाबतीतला आत्मविश्वास खंबीर झाला का जिकडे नजर जाईल तिकडे सारी आजूबाजूची परिस्थिती खडाखड बदलत गेलेलीच अनुभवाला येईल. ६ व्या हेन्री नाटकात शेक्सपियरने Fearless minds climb soonest unto crown (निर्भय मने हां हां म्हणता किरीटधारी बनतात.) असा सिद्धांत मांडला आहे. श्रीसमर्थ रामदासांनीही जनपेिक्षा मनालाच उपदेशाची टोचणी लावून त्याला प्रबुद्ध, प्रबळ, पराक्रमी बनविण्याचा इशारा दिलेला आहे. आत्मविश्वासाची कमावणी स्थिर करण्यासाठी, तरुणांनी दुश्चित्तपणा खरचटून काढला पाहिजे. "उदंड खस्तिची कामे मर्द मारूनि जातसे, नामर्द काय काय ते लंडी सदा दुश्चित लालची" (रामदास)
अभिरुचीचे संशोधन
आपल्या आवडीचे विषय कोणते, हे निश्चित ठरविण्याचे काम जितके कठीण तितकेच ते आवश्यक आहे. वक्ते, लेखक यांनी ज्ञानसंग्रह किती करायचा? किती विषयात प्राविण्य मिळवायचे? ज्ञानाचे विषय अनंत. "शास्त्रे फार अपार जिवित तुझे अत्यल्प की मानवा." सर्व शास्त्रांत नि सर्व विषयांत पारंगत असे महात्मे विरळा. भाराभर विषयांच्या चिधोट्या घांदोट्या मस्तकात कोंबवण्यापेक्षा, निश्चित अशा ४-५ विषयांत परिपूर्ण पारंगत होणेच श्रेयस्कर. हे विषय आपल्या आवडीचे असावे. पण ही आवडीची निवडही पुष्कळांना नीटशी साधत नाही.
विश्वविद्यालयाचे शिक्षण चालू असताही पुष्कळांना `आपण पुढे कोण होणार? काय करणार? हे निश्चित सांगता येत नाही. आजूबाजूचे कॉलेजात जातात, म्हणून हे जातात, पदवीधर होतात, तरीही `पुढे काय?` हा प्रश्न त्यांना सोडवता येत नाही. अभिरुचीचे संशोधन दुसऱ्याची नक्कल करून साधत नाही. नजरेसमोरच्या बी. ए., एल.एल.बी.ची वकिली जोरात चालून त्याला पैसाही अलोट मिळतो, म्हणून आपणही तोच अभ्यास करून वकील होणारे शेकडा ८० लोक अनेक कोर्टात कफल्लक जीवनाच्या माशा मारताना दिसतात. जे वकीलीचे ते डॉक्टरीचे आणि इतर व्यवसायाचे.
यशस्वी झालेल्या वकिलाने अथवा डॉक्टराने आपल्या अभिरुचीचा बिनचूक अंदाज ठरवून, निर्धाराने आणि आत्मविश्वासाने त्या विषयाच्या अभ्यासाला हात घातलेला असतो. संभावित आणि किफायतशीर धंद्याचा एक मार्ग म्हणून अनुमान धपक्याने अभ्यासाची जुगार खेळलेली नसते. तोच विषय आपल्या आवडीचा आहे आणि त्यानेच आपण जीवन सार्थ करू, ही त्याची पक्की खात्री असते. बाकीचे केवळ अनुकरण करून, साधली तर शिकार नाहीतर भिकार, अशा अंदाजाने त्या फंदात पडलेले असतात, म्हणून फसतात. त्यांना विषयाचा आणि आपल्या स्वतःच्या हिमतीचा आत्मविश्वास नसल्यामुळे, पदोपदी भीतीचे नि कमकुवतपणाचे वारे त्यांना भेदरवीत असते.
ज्या विषयाची आवड नाही, त्यात एकाग्रता आणि एकतानता साधणार कशी आणि आत्मविश्वास खंबीर होणार कसा? होणारच नाही. आपल्या आवडीचा विषय, आईबापाच्या आणि आजुबाजूच्यांच्या पसंतीचा नसेल कदाचित. म्हणून काय झाले? त्यांच्या लहरीखातर आपण आपल्या अभिरुचीचा बळी द्यायचा? भिन्न अभिरुचीने मानवी जीवनाचा केवढा घात होतो, त्याचे एक पाश्चिमात्य विचारवंताने काढलेले हे चित्र पहा -
"एखाद्या विषयाची हृदयात तिळभरही आवड नसते, त्याच्याशीच माथेफोड करून पोट भरण्याचा प्रसंग ज्या तरुणावर येतो, त्याच्या आयुष्याची दुर्दशा काय सांगावी? आत्मशक्ती लंजूर पडल्यामुळे, उज्ज्वल भवितव्याचा प्रकाशही त्याला दिसेनासा होतो, त्याच्या मनोवृत्तीची वाढ खुंटते, तो आत्मद्वेषी बनतो, स्वतःबरोबरच इतरांचाही तो तिरस्कार करू लागतो आणि मानवी जीवितातील उत्तमोत्तम सत्त्वांना तो मुकतो. मनुष्य कोणत्याही दर्जाचा असो, त्याला स्वाभिमान असतो. स्वत:च्या प्रतिष्ठेची चाड असते. चुकीच्या मार्गदर्शनाने असो अथवा कोणाच्या लहरीच्या मुर्वतीसाठी असोत, भिन्न अभिरुचीच्या व्यवसायावर पोट भरण्यासाठी दररोज सारखी माथेफोड करण्याचा प्रसंग त्याच्यावर येणे, यासारखे दुर्भाग्य कोणते?"
वक्ता किंवा लेखक स्पेशालिस्ट तज्ज्ञ असावा
कोणत्याही एका किंवा तत्सम ४-५ विषयांत तज्ज्ञ म्हणून जनतेपुढे उभे राहण्यातच जीवनाचा आणि स्वाध्यायाचा खरा आनंद आणि अभिमान चाखायला मिळतो. अमक्या विषयावर तो तमका गृहस्थच अधिकारवाणीने बोलणार आहे, हा लौकिक फार मोलाचा असतो. पंडितांच्या सभेत वक्ता जाऊन बसला. तेथे चाललेला विषय त्याच्या अभिरूचीच्या कक्षेतला नसला तरीही `त्याला चार शब्द` बोला असा आग्रह होताच. त्याने विनम्रपणाने उभे राहून श्रोत्यांना सांगितले की, `चालू विषय माझा नव्हे, मी त्यावर बोलू शकणार नाही`, तर तो त्याचा नकारसुद्धा सभाजनांच्या कौतुकाचा विषय होतो. ते त्याच्या ठराविक विषयाच्या आत्मविश्वासाची तारीफ करतात आणि जेव्हा त्याच्या त्या ठराविक विषयावर बोलण्यासाठी तो उभा राहतो, तेव्हा त्याच्या अधिकाराने श्रोते आधीच भारावून जातात. अभिरूचीने निवडलेला विषय, वक्त्याने एकतानतेने केलेला त्याचा सांगोपांग अभ्यास, विषयाचे क्षेत्रही आटोपशीर आखलेले. मग हो काय! आत्मविश्वासाने एकेक मुद्दा तो श्रोत्यांना पटवीत चालला का त्याची वाणीसुद्धा अमोघ शैलीने आरोहावरोहांच्या ताल ठेक्यावर नाचत बागडत वाग्विलासाची बहार उडवते.
`स्पेशलायझेशन` एक योग आहे
योग म्हणा, प्रयोग म्हणा, पण विषयाच्याच केवळ नव्हे तर व्यक्तित्वाच्या (पर्सनॅलिटी) पूर्ण आविष्काराची ती एक नाजूक नि मार्मिक बारकाव्याची कला आहे. कल्पनेचे किंवा भावनेचे नुसते पतंग उडवून ती साचत नाही. त्यासाठी आपल्याला समाजाच्या प्रत्यक्ष जीवनशीन एकरूप समरस लागते. समाजात एक विशेष आचार किंवा विचार फेकायचा आहे, एक निश्चित क्रांती घडवायची आहे, विचारांना जोरदार धक्का देऊन आचाराचा ओघ बदलायचा आहे. एवढा निश्चय झाल्यावर त्या दिशेने अभ्यासाची, संशोधनाची निरीक्षणाची नितन मननाची, अनुकूल-प्रतिकूल विधानांची नि विकल्पांची कसोशी सुरू होते. पुस्तकी स्वाध्यायाच्या बरोबरीने, समाज जीवनातील विविधतेचा साक्षेप घेणे भाग पडते. सामाजिक विविधता म्हणजे मानवी जीवनाचा एक आंबट, तिखट, तुरट, कडवट, रुचकर मसालाच होय. तो आपल्याही जीवनाला रुची देतो. त्याचा एकांगी एकरंगीपणा घालवतो, जीवन अनेक अंगांनी नि रंगढंगांनी जगायचे असते, नव्हे, जगावे लागते, हा अनुभव पटतो. अशा रीतीने, मन एकाग्रतेवर आरूढ झाले का ज्ञानप्राप्तीच्या दिशा उजळत जातात. लहानमोठे संदर्भ हाताशी चालून येतात. स्मरणशक्ती तल्लख बनते.
जेथे जाईल तेथे तो आपल्या निश्चित विषयावर आपुलकीच्या तळमळीने बोलू लागतो. इच्छाशक्ती तर इतकी प्रभावी होते का कल्पतरूप्रमाणे तो जे वांछिल ते लाभे, असा चमत्कार होत जातो. दर क्षणाला आत्मविश्वासाचा पाया बळकट होतो. विषयाच्या आविष्काराबरोबरच त्याची व्यक्तिमत्ता (पर्सनॅलिटी) उज्ज्वलतेने इतरांच्या मनाचा वेध घेऊ लागते. स्वाध्यायाची तपस्या चालू असताना, लहानसान मुद्दे क्षुद्र म्हणून तो झिडकारीत नाही. क्षुद्र मुखातूनही वेळी महान सत्य हाताला लागते आण कित्येक मोठ्या गोष्टी अनुभवाने शुल्लक असल्याचा पडताळा येतो. अभिरुचीने निश्चित केलेल्या विषयाच्या निदिध्यासाला अखंड वाहून घेणाऱ्या अभ्यासकाला स्पेशलायझेशनची सिद्धी साधताना या सर्व बारकाव्याच्या प्रयोगातून जाताना होणारा आनंद ज्याचा त्यानेच लुटावा.
लोकशाही भारताला आज असल्याच तपस्येचे स्पेशलाईइड वक्ते, ग्रंथकार, कवी आणि प्रवचनकार हवेत. व्यापारउदीम, धंदे आणि कलेच्या नानाविध ही अशा तज्ज्ञांनी आज उणीव भासत आहे. म्हणून अभिरूचि संशोधनाचे माहात्म्य पूर्वीपेक्षा आज फार आहे.
परिस्थितीचा बागुलबुवा
भीतीच्या भावनेप्रमाणेच परिस्थितीचे रडगाणे मनुष्य आपण होऊन स्वतःवर ओढवून घेत असतो. “काय करावे, परिस्थिती अनुकूल नाही", असल्या तक्रारी करणाऱ्यांना खरे म्हटले तर, कसलेच काही ध्येय नसते. अभिरूचीचा, स्वतःच्या हिंमतीचा किंवा निश्चित दिशेने उद्योग करण्याचा, कसलाच काही विचार ते करीत नाहीत. मनात महत्त्वाकांक्षेचे तुफान मात्र खूप भडकवितात. ती महत्त्वाकांक्षासुद्धा अभिरुचीच्या काटेकोर संशोधनाने ठरविलेली नसते. कोणत्या बंदराला जायचे आहे हे ज्याने ठरविलेले नाही, त्याला कोणता वारा अनुकूल असणार? आणि कोणत्या खुणेवर आपला बाण लागला पाहिजे, हे ज्याने निश्चित केलेले नाही, तो नेम काय धरणार? परिस्थितीचे रडगाणे गाणारांना सगळे काही आयते आपल्या पुढ्यात वाढून यावे, असेच वाटत असते. अनुकूल वातावरण असेल तर हवा तो रेम्याडोक्या काय हवे ते करून दाखवील. त्यात शहामत कसली? प्रतिकूल परिस्थितीला टकरा देत देत जो आपले ध्येय गाठण्याची शिकस्त करतो, तोच खरा मर्द, तोच खरा वीर.
परिस्थिती वीरांची माता का वीर परिस्थितीचा पिता? भिक्षुकांची भिक्षुकशाही बेताल भडकली म्हणून श्रीएकनाथ अवतरले आणि इस्लामी साम्राज्यशाहीचे धिंगाणे दक्षिणेत चालू झाले म्हणून शिवाजी महाराज अवतरले, हा सिद्धांत चूक आहे. परिस्थितीचा कुसवा वीरप्रसू नसतोच मुळी. बेशिस्त बंडखोर परिस्थितीला कर्तबगारीच्या हंटरचे तडाखे लगावून, सर्कशीतल्या खुनशी सिंहिणीप्रमाणे, मर्दवीर हवी ती कसरत शिस्तबाज करायला लावतो. वेळी परिस्थिती तुफान होऊन गुरकावू लागली तरी कधी दरडावून, ठरलेल्या कसरतीची कोलांटी उडी तिला मारायला लावतोच लावतो. तो तिच्या नजरेला भिडलेली आपली नजर क्षणमात्र हलवणार नाही, का नरमवणार नाही.
हा सारा इच्छाशक्तीचा प्रभाव
कलाकौशल्य, शास्त्रे, व्यापार युद्धकला, वाङ्मय, राजनीती, तत्त्वज्ञान, ज्ञान, विज्ञान, हवे ते क्षेत्र घ्या. तेथल्या आजवरच्या कल्पनातीत क्रांत्या, जबरदस्त इच्छाक्तीच्या वीरांनीच घडवून आणलेल्या आहेत. आपल्या आठवणीतलीच उदाहरणे पहा - ज्या दिवशी महात्मा गांधींनी ब्रिटिशांना "चले जाव, भारत छोडो" ही निर्वाणीची आव्हाने दिली, त्यावेळी एकंदर देशाची परिस्थिती कितीशी अनुकूल होती? कसली सत्ता अगर शस्त्रास्त्रे लोकांच्या हाती होती? धमकी म्हणजे नुसता तोंडाचा फुत्कार. त्याने का ब्रिटिश सत्ताधारी वंगणार होते? लागलीच धरपकड करून एकजात सर्व चळवळ्यांना त्यांनी टिप्णून बंदिखान्यात कोंबले आणि देशभर जोरजबरदस्तीचा वरवंटा फिरविला. पण त्या `चले जाव` गर्जनेच्या मागे महात्मा गांधीच्या इच्छाशक्तीचा इतका दुर्दम्य जोर होता की त्याच क्षणापासून `छोडो भारत` ही गर्जना आसेतुहिमाचल कोट्यानुकोटी जनतेच्या हृदयांतून तितक्याच जोरकस प्रभावाने साद पडसाद देत उठली आणि श्रमसाहसांची निश्चित परमावधी होताच, इंग्रज लोक भारत सोडून हद्दपार केले.
हे राज्य व्हावे हे श्रीच्या मनात फार आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छाशक्ती आणि "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळविणारच", ही लोकमान्य टिळकांची निर्धाराची उक्ती. हे जर परिस्थितीचा बागुलबुवा करीत बसले असते, तर स्वराज्यप्रातीच्या इतिहासात अजरामर झाली असती काय?
या मोठ्यांच्या मोठया गोष्टी सोडल्या तरी सामान्य माणसांनाही त्यांच्या सामान्य जीवनक्षेत्रात इच्छाशक्तीच्या जोरावर हवा तो मनोदय साधता येतो, असा माझा अनुभव आहे. आत्मस्तुतीचा माझ्यावर आरोप करणार नसाल, तर एक गोष्ट सांगतो. `अशक्य ते शक्य करिता सायास` या अभंगवाणीचा प्रत्यय मी घेतलेला आहे.
डॉ. अॅनी बेझंटबाईंची होमरूल चळवळ जोरावली होती. सरकारी खात्यात मी दरमहा अवघे ६० रुपये कमावणारा स्टेनो टायपिस्ट होतो. शिकवण्या वगैरे करून ७-८ माणसांच्या कुटुंबाचा संसार कसाबसा रेटीत होतो. गिरगावातल्या चायना बागेत दर गुरुवारी सायंकाळी होमरूलच्या प्रचंड सभा भरायच्या. थोरथोर भारतीय पुढारी भाषणे करायचे. ध्वनिलेखक म्हणून ती भाषणे शब्दशः उतरून घ्यायला मी खासगी रीतीने नियमित जायचो. स्थानिक वृत्तपत्रांचे बातमीदार माझे स्नेही बनले. आमचे एक कंत्राट ठरले. भाषणांचे इतिवृत्त मी घ्यायचो नि त्यांना लिप्यन्तर (ट्रान्सक्रिप्शन) करून कार्बनप्रती द्यायचो. सारे मिळून मला ५ रुपये द्यायचे. पण टाईपरायटर नसल्यामुळे, सारे काम हस्तलिखिताने करणे कठीण जाऊ लागले, ६० रुपयांचा टायपिस्ट मी. मला साडेपाचशे-सहाशे रुपयांचा टाईपरायटर कशाने मिळणार? तो जवळ कमी असल्याशिवाय झटकन रिपोर्ट तरी कसे देणार? छे, छे. मला टाईपरायटर हवाच हवा. रात्रंदिवस एकच. ध्यास लागला. जिवाला चैन पडेना. स्वप्नांतही टाईपरायटर घरी आणल्याचे देखावे मला दिसू लागले. खाता, पिता, बोलता चालता, ध्यानी मनी, स्थानी टाईपरायटर इच्छाशक्ती कमाल शिगेला पोहोचली. वेडा झालो होतो म्हणा ना.
उत्तम टायपिस्ट म्हणून माझे नाव पुष्कळांना माहीत होते. काम स्वच्छ, चोख नि बिनचूक. अचानक एक दिवस एक मोठे सॉलिसिटर स्नेही घरी आले. त्यांच्या अशिलाचे ६०० फुल्स्कॅप पानाचे मोठे अपील प्रिव्हिकौन्सिलात दाखल करायचे होते. लंडनच्या छपाईसाठी टायपिंगचे काम मीच करावे असा त्यांनी आग्रह धरला. अयाचित चांगल्या प्राप्तीचे काम कामधेनूसारखे घरी चालत आले, आणि माझ्याजवळ टाईपरायटरच नाही! मनात व्याकूळ झालो. त्यांना माझी अडचण सांगितली. त्यांनी तोड काढली. टायपिंगचा भाव दर पानाला १ रुपया, कार्बन प्रतीला प्रत्येकी २ आणे, असा सांगितला. म्हणजे अंदाजे ते काम ५०० रुपयांचे होत होते. त्यांनी मला ३०० रुपये बयाणा दिला, मी तसाच त्यांच्या बरोबर कोर्टात गेलो आणि २८० रुपयांचा कोरोना पोर्टेबल टाईपरायटर विकत घेतला. त्यांचे काम केले नि माझा ६ महिन्यांचा हेतू सफल झाला. वर द्रव्यप्राप्ती झाली ती वेगळीच. हा इच्छाशक्तीचाच परिणाम नव्हे काय?
इच्छाशक्ती कमवावी लागते
अभिरुचीने विषय निवडला, त्याच्या साध्याचे ध्येय निश्चित झाले, कळकळ, एकाग्रता, नि तन्मयता, उफाळू लागली, समोर दिसेल त्या लहान-मोठ्या यत्नांची कसोशी करीत राहिलो, अपयशाची पर्वा न करता सारखे एकाग्रचित्त पण कुशलतेने झगडतच राहिलो, तर आपल्या आंगच्या अनेक उत्तोमत्तम गुणांची नि शक्तींचा होत असलेला विकास हे काय विलक्षण सामर्थ्य असते, याचा मनोमन साक्षात्कार पटत जातो. एकाच ध्येयावर चित्ताची एकतानता खिळून राहिल्यामुळे, इच्छाशक्ती दर क्षणाला आपल्या उज्जवल प्रभावाने मनुष्याचे अंतर्बाह्य उजळीत जाते, हे कसे काय होते, ते शब्दांनी सांगता येणार नाही. त्याचा ज्याने त्याने अनुभव घेतला पाहिजे.
या पुराणाची काय आवश्यकता?
वक्तृत्वशास्त्राच्या निरुपणात कळकळ, एकाग्रता नि इच्छाशक्ती इत्यादी मुद्यांच्या विवरणाची जरुरच काय? असा प्रश्न काहीना विचारावासा वाटतो. त्याचा खुलासा मुद्दाम येथेच केलेला बरा.
कोणी कितीही पट्टीचा विद्वान, शास्त्रज्ञ अथवा कलावंत असला तरी शीलाने तो हिणकस नसावा, ही समाजाची अपेक्षा असते. त्याचा आत्मविकास पूर्ण झालेला असावा. तो एक उत्तम नागरिक असावा. म्हणूनच व्यक्तीमात्राच्या स्वभावधर्म उत्कर्षाची (कॅरॅक्टर बिल्डिंग) कसोशी करणे, हा मातापिता आणि शिक्षणसंस्था यांचा सनातन धर्म झालेला आहे. लोकशाही स्वराज्यात तर असल्या शीलसंपन्न नागरिकांचे माहात्म्य फार मोठे असते. अनीतिमान नि बदफैली लोक फर्डे लेखक नि वक्ते म्हणून कितीही लोकविश्रुत झाले, तरी त्यांचे ते लेखन नि वक्तृत्व समाजाच्या प्रागतिक घटनेला साहाय्य करण्यापेक्षा धोकेबाज ठरण्याचा संभव अधिक असतो.
कौटुंबिक आणि सामाजिक किंवा कौटुंबिक जीवनाशी सार्वजनिक जीवनाशी ताळमेळ घालण्याचा खटाटोप करू नये, असा जो वेदान्त बऱ्याच ठिकाणी ऐकू येतो, तो मतलबी असतो. सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तींच्या खासगी जीवनातल्या भानगडीवर बुरखा पांघरण्याचा तो उद्योग असतो. तो व्यर्थ आणि निंद्यच समजावा. म्हणून मुद्दाम ह्या पुस्तकात मनोविकास आणि आत्मविश्वास इत्यादी मुद्यांवर मी कटाक्षाने जोर दिलेला आहे. लोकशाहीवादी राष्ट्राला शीलवंत नागरिक म्हणजे भूषण तर खरेच, पण राष्ट्राचे खरे सामर्थ्यबिंदू तेच असतात.
प्रकरण १३
विकार-प्रदर्शन आणि अभिनय
विकार-प्रदर्शन हा प्रत्येक प्राणीमात्राचा स्वभावजन्य गुणधर्म आहे. पशु, पक्षीसुद्धा नुसत्या आपल्या डोळ्यांच्या विवक्षित चलनवलनाने निरनिराळ्या भावना नि विकार व्यक्त करीत असतात. आपण बोलतो तेव्हा आपल्या विकार व्यक्त करताना, शब्दोच्चारांबरोबर अनेक शारीरिक अवयवांच्या विवक्षित चलनवलनांचाही सहजगत्या उपयोग होत असतो. विविध विकारांनुसार शब्दोच्चारातील आवाजात जी सप्तस्वरी आरोहावरोही कंप, वळणे, वाकणे आपोआप निर्माण होत असतात. त्यांना बिनचूक पोषक अशी आपल्या अनेक अवयवांची जी शारीरिक हालचाल होत असते, ती होत आहे, याचे आपल्याला भानही नसते. इतकी ती क्रिया स्वाभाविक सिद्ध असते.
व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येक व्यक्तीची विकार दर्शनांची लकब खास निराळी असते. क्रोध किंवा त्वेष हा एकच विकार घेतला तरी तो निरनिराळ्या व्यक्ती आपापल्या स्वभावधर्माप्रमणे, म्हणजे पिण्डप्रकृतीप्रमाणे व्यक्त करतात. कित्येक नुसते डोळे लालबुंद ताठर करून दात ओठ चावतात. काहीजण हे करून शिवाय मुठी वळतात. हातावर हात आपटतात. कित्येक मोठ्याने ओरडतात, तर काही डोळे झाकून खालच्या मानेने दीर्घ फुत्कार टाकू लागतात. अनेकांचे प्रकार अनेक असले तरी विकार कोणता, हे पाहणारांना तेव्हाच उमगते. म्हणजे, विकारप्रदर्शनाचे ठराविक साचेबंद नियम मांडता येणार नाहीत, असा सरळ अर्थ निघतो.
प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विकारप्रदर्शन
अप्रत्यक्ष विकारप्रदर्शनाचा मुद्दा रेडिओने निर्माण केला आहे. जोवर भारतात टेलिव्हिजन चालू झाले नाही, तोवर रेडिओवरची भाषणे ऐकताना वक्ता आपल्या नजरेसमोर नसतो. अशा अप्रत्यक्ष अवस्थेत विकारप्रदर्शनाचे कार्य शब्दोच्चारांनीच वठवणे भाग पडते आणि हीच एक नवीन कला झाली आहे. फारच थोड्यांना ती साधते. रेडिओ-भाषणे जरी केवळ शब्दोच्चारांनीच साजरी करावयाची असतात, तरी तेथेही विकारप्रदर्शनासाठी शारीरिक अवयवांची हालचाल होतच असते, नव्हे, करावीच लागते.
निर्विकार चेहऱ्याची माणसे
शारीरिक अवयवांची अथवा चेहयावर कसलीही हालचाल न करता, निर्विकार मुद्रेने बोलणारे आणि समोर कोणी कितीही तळमळीच्या भावनांनी आरपार रंगून बोलत असताही अगदी दगडी पुतळ्याप्रमाणे शांत निर्विकार राहणारे लोक नसतातच असे नाही. पण असते नमुने तुरळकच. माणसाचा चेहरा म्हणजे त्याच्या अंत:करणातील भावनांच्या घडामोडीचे चित्र दाखवणारी तबकडी. मानसिक नाना विकारांच्या भल्याबुऱ्या रंगांचे शिडकाव दर्शविणारा स्क्रीन पडदा. पण कित्येक व्यक्तीचा हा पडदा केव्हाही पहा, कोराच्या कोरा साथी स्मितहास्याची शुल्कही त्यावर उमटायची नाही. त्याच्या अंतरंगाचा ठाव लागणे कठीण असली आतल्या गाठीची मंडळी एक तर महाकारस्थानी असतात, किंवा दीर्घ धोरणी असतात.
खुनाचा आरोप झालेल्या अशिलाच्या बचावासाठी वकील बॅरिस्टर न्यायाधीशापुढे दयेची याचना करताना, माणुसकीला पाझर फोडणारे भाषण करताहेत आणि न्यायाधीश महाराज शांत निर्विकार चेहऱ्याने ते पुराण ऐकत आहेत, असे देखावे न्यायालयात पुष्कळ पहायला मिळतात. फिर्यादी नि आरोपी ह्यापैकी कोणत्याही बाजूबद्दल कसलाही अनुकूल प्रतिकूल ग्रह चेहऱ्यावर व्यक्त होऊ न देण्यासाठी त्या न्यायाधीशांना आपल्या मनोविकारांवर केवढा जबरदस्त ताबा ठेवण्याची हिकमत साधावी लागत असेल, हा एक अभ्यसनीय मुद्दाच नव्हे का? असल्याच प्रसंगी वक्त्याच्या वक्तृत्वशक्तीची खरी कसोटी लागत असते.
पुस्तकात ज्या विनोदी कोट्या वाचताना, सर्वसाधारण मानवी विकारांच्या वाचकांच्या हसता हसता मुरकुंड्या वळतात, त्या कोट्या फत्तरी चेहऱ्याने वाचणारे महाभाग नसतात असे नाही. निर्विकार चेहऱ्याचे वक्ते बोलतानासुद्धा आपल्या शब्दोच्चारांतून कसलाही काही भाव निर्माण न होईल, इतका एकसुरेलपणा कायम ठेवतात. असले ठोकळे व्यासपीठावर आले आणि त्यातल्या त्यात तो एखादा जाडी प्रस्थ असला की सभास्थानी थंडीच पडू लागते. केव्हाही पहा, चेहरा निर्विकार ठोकळी, पण स्वारी बोलायला लागली का (स्वत: किंचितही स्मितहास्य न करता) विनोदी कोट्यांच्या खैरातीने श्रोत्यांना पोट दुखतोवर हसायला लावणारी मंडळीही आढळतात के. वा. रा. टिपणीस हे एक या वर्गातील वक्ते नि विनोदी लेखक होते. कित्येक वेळा सभास्थानी असल्या निर्विकार श्रोत्यांपुढे भाषण करण्याचा प्रसंग वक्त्यांवर येतो. विरोधी पक्षापुढे आपली बाजू मांडण्याचा यत्न करणाऱ्या वक्त्याला श्रोत्यांकडून असल्याच दगडी मौनाची सलामी हमखास मिळत असते. कारण, त्याची भंबेरी उडविण्यासाठीच श्रोते मौनाचा चंग बांधून सभेला जमलेले असतात. अशाही प्रसंगी जो वक्ता श्रोत्यांच्या विकारांना नि भावनांना खडबडून गदगदा हलवील, त्याची खरी शहामत!
"थेटरात माणसे आहेत का घोडे?"
आचार्य प्र. के. अत्रे यांचे `कवडीचुंबक` नाटक म्हणजे प्रत्येक पात्राच्या तोडच्या शब्दाशब्दाला हास्याचा हुकमी खोकाट उडविणारे विनोदी नाटक, त्यातल्या भूमिका वठवणारेही कोणी आडूमाडू नव्हते. नामांकित साहित्यिक आणि नावाजलेले वक्ते. मुंबईला या नाटकाचे अनेक यशस्वी प्रयोग झाल्यावर, पुणेकरांच्या आग्रहावरून, डेक्कन जिमखाना वसाहतीतील `हिंद विजय` सिनेवथेटरात प्रयोग करायला अत्रे कंपू गेला. राजेरजवाडे, वकील, पुढारी, पत्रकार सारे झाडून सहकुटूंब आले. थेटर अक्षरश: चिक्कार भरले. प्रयोगाला सुरुवात झाली. पहिला अंक नेहमीप्रमाणे ठाकठीक होऊन पडदा पडला. पण प्रेक्षकांतून एकदाही साधी हास्याची फुसकुली उठली नाही. आहे काय हा चमत्कार? आचार्य अत्रे विस्मयचकित होऊन म्हणाले, "थेटरात आज माणसेच भरली आहेत का निर्बुद्ध घोडे? एवढी आम्ही आमची आतडी चिवडतो आहोत, पण त्या लेकांच्या कातड्याला जरासुद्धा सुरकुती पडत नाही? आहे काय हा प्रकार?"
काढले एक पुणेकरांचे बिंग हुडकून. नाटकात दादर मुंबईच्या ज्या काही स्थळांची नावे होती, त्या जागी पुण्यातल्या ठराविक स्थळांची नावे वापरून त्यांची टिंगल करायला पात्रांनी सुरुवात केली. मग हो काय? सारे थेटर जिवंत होऊन माणसासारखे हास्याच्या खोकाटात एकमेकांवर कोलमडू लागले. दादर मुंबईच्या विवक्षित स्थळांचे माहात्म्य पुणेकरांचा काय होय? त्यांचा तो ढमढेऱ्यांचा नि शालुकराचा बोळ, तो पासोड्या नि भिकारदास मारुती, तो संभाजी पार्क नि ते भांग्या मारुतीचे गटारयंत्र, तो लकडी पुल या बिजा त्यांच्या कानी पडल्या तेव्हा प्रेक्षकांतला पुणेकर जागा झाला आणि त्याने पुढच्या दोन्हीही अंकांचे मनसोक्त रसग्रहण केले.
प्रसंगावधानाची आवश्यकता
काय केले असता श्रोत्यांची थंडगार किंवा विरोधी वृत्ती वेतनापूर्ण करता येईल. हे चटकन ठरविण्याइतके प्रसंगावधान वक्त्याला अवश्य असले पाहिजे. विकारांनी विकार चेतवले जातात, मात्र ती चेतवण्याची क्रिया प्रसंगानुसार कुशलतेने करावी लागते. आपल्या निश्चित मतांची नि विचारांची छाप श्रोत्यांवर बिनचूक पाडण्यासाठीच वक्त्याला भाषणे करायची असतात. अर्थात शब्दोच्चारांच्या जोडीने विकारप्रदर्शनाची कसोशी करीत असतानाच, श्रोत्यांना पहिल्या झटक्यातच अनुकूल करून घेण्याची हिकमतही साधली पाहिजे.
साप-मुंगशी विरोधी मतांच्या दोन पटाईत वक्त्यांची भाषणे एका सभेत होती. कोण कोणाला चीत करतो एवढेच पाहायला लोक भरगच्च जमले होते. पहिल्या वक्त्याने अस्खलित भाषण करून प्रतिस्पर्ध्याचा पार धुव्वा उडवला. सभाजन त्याच्या विरोधी विधानांच्या पचनी पडून पक्के विरोधी आणि कलुषित झाले. वातावरण नुसते विरोधीच नव्हे, तर गरम झाले होते. पण दुसरा वक्ताही शेराला सवाशेर हिकमती होता. अगदी मोकळ्या मनाने हासत हासत तो व्यासपीठावर आता. "सभाजनहो, येथे येण्यापूर्वी महाशय .... ह्यांच्याविषयी म्हणजे त्यांच्या विशिष्ट मतांविषयी माझा जो ग्रह झालेला होता, तो आपल्यापैकीच काही सज्जनांनी मुद्दाम मला भेटून दूर करण्याची तसदी घेतल्यामुळे मी एका विशेष समाधानी वृत्तीने आपल्यापुढे आलो आहे."
बस्स. इतके शब्द बोलताच सारे सभागृह टाळ्यांनी कडाडले. त्यांना वाटले, बेट्याने माघार घेतली. श्रोतृवर्ग अशा रीतीने आपल्या काबूत आलेला पाहताच, त्याने पुढे बोलायला सुरुवात केली. "भगिनी बांधवहो, ऐकणे आणि पाहणे ह्यात चार बोटांचे अंतर असते. म्हणून वस्तुस्थितीचा बिनचूक शोध लावणे आणि सत्य सिद्धांत पत्करणे, हेच प्रत्येक विचारवंताचे कर्तव्य ठरते. वस्तुस्थिती कशी ती पाहा..." आणि मग त्या वक्त्याने प्रतिस्पर्ध्याचा एकेक मुद्दा हळुवार चर्चेला घेऊन अगदी विनोदपूर्ण विधानांनी त्याच्या अशा काही चिंधड्या उडवल्या आणि श्रोत्यांनाही त्याची टर उडवायला लावले का सांगता सोय नाही. त्याने सभा जिंकली.
खायचे दाखवायचे दात निरनिराळे
मनात असते एक आणि शब्दोच्चारांनी आणि विकारप्रदर्शनाने दाखवतो भलतेच, अशा कळसूत्री करामतीचेही काही लोक असतात. चेहऱ्यावरचा विकार हसतमुख, पण मनाच्या खोल कण्यात बातबेत चाललेले असतात घातपाताचे. `सहावा हेन्री` नाटकात शेक्सपियरने ग्लॉस्टर म्हणून एक पात्र रंगवले आहे. तो आपल्या करामतीविषयी म्हणतो
Why, I can smile, and murder whiles I smile;
And cry content to that which grieves my heart;
And wet my cheek with artificial tears;
And frame my face to all occasions.
I`ll drown more sailors then the mermaid shall;
I`ll slay more gazers than the basilisk;
I`ll play the orator as well as Nestor;
Deceive more silly than Ulysses could;
And, like a Sinon, take another Troy;
I can add color to the chameleon;
change shapes with protease for advantages;
And set the murderous Machiavelli to school.
Can I do this, and cannot get a crown?
Tut, were it further off. I`ll pluck it down.
अवयवांच्या हालचारी
निरनिराळे विकार आणि मनाचे व्यापार व्यक्त करताना आपल्या अनेक अवयवांच्या हालचाली कसकशा होतात, हे आपण आता पाहू.
विकार व हालचाली
प्रेम, सहानुभूति, भक्ति : स्वरात किंचित आरोहाची खोच, डोळ्यात सौम्य चमक, तोंडावर स्मितहास्याची झुळुक.
गांभीर्य : भुवया किंचित् खाली पडल्यासारख्या, दोन्ही ओठ बंद, दृष्टी स्थिर
विस्मय, आश्चर्य, चमत्कार : भुवया वर चढतात, तोंड व डोळे उघडे (म्हणजे विस्फारलेले), स्वरोच्चारात `ह` कार येतो, म्हणजे `क`चा उच्चार `ख`सारखा आणि `ट`चा उच्चार `ठ` सारखा.
प्रसन्नता, शांती : दृष्टी, मंद, चेहरा गंभीर, शरीर अचल.
चिंता, खेद, दुःख : चेहऱ्याचे स्नायू खालच्या बाजूला खेचले जातात. शरीर शिथिल पडते.
संकट, शोक : ओठांचे दोनही कोपरे (अधर कोन) खालच्या बाजूला ओढले जातात.
दुःखावेशाचा परिणाम : हातांनी मस्तक बडवणे, हातपाय आपटणे, वेड्यासारखे चावणे सभास्थानी नव्हे.)
भीती : स्वर अशक्त व कंपित, ओठ, चेहरा, शरीर थरथरणे, हृदयाची धडधड जोराने होणे. लाजाळूपणा : चोरटा दृष्टीकटाक्ष, (हा विकार बहुश: स्त्रियांत विशेष असतो.)
गर्व : चेहरा उद्धट, मान ताठ, शरीराची ठेवण अचल, डोळे ताठ विस्फारलेले, खालचा ओठ वरच्यापेक्षा आत खेचलेला.
धैर्य : शरीर ताठ, आवाजाचा स्वर भरघोस आणि ठाशीव
श्रोत्यांसमोर वक्ता येऊन उभा राहताच, निमिषार्धात ते त्याला आपादमस्तक अभ्यासतात. इतकेच नव्हे तर त्याविषयी तात्काळ काही अंदाजही बांधतात. भाषण करण्याच्या जागेकडे तो चालत येतो कसा उभा राहतो कसा, त्याचा चेहरा मोहरा काय विकार दर्शवितो, इत्यादी बारीक सारीक हालचालीकडे श्रोते चिकित्सेने पाहत असतात. तोडातून शब्द बाहेर पडण्यापूर्वीय वक्त्याला आपल्या व्यक्तीमत्वाची (पर्सनैलिटीची) छाप श्रोत्यांवर पाडावी लागत असते. यासाठी मस्तक, चेहरा, डोळे इत्यादी अवयवांचे ठाममाण कसे राखावे, याविषयी माहिती देतो.
मस्तक :
मस्तक नीट ताठ नि सरळ ठेवावे. एका बाजूला कलते ठेवल्यास यांकडे आपण चिकित्सेने किंवा कुचेष्टेनेही पाहात असल्याचा त्यांना संशय यायचा.
मस्तकाची ठेवण व कोणता विकार दर्शविते
ताठ सरळ : निरहंकारी वृती, धीटपणा, आनंद अभिमान, अधिकार
मस्तक वर केले असता : आशा, प्रार्थना.
मस्तक खाली वाकविले असता : लज्जा, विनय किंवा मनन.
मस्तक किंचित पुढे आणणे : विनंती, आर्जव (कोण काही सांगत असल्यास ते) ऐकणे, सहानुभूती अथवा अपेक्षा दाखविणे.
मस्तक किंचित मागे नेणे : आश्चर्य, विस्मय, भीती, बेपर्वाई.
हालते मस्तक : नकार, नाकबुली, असंतोष किंवा कटाक्ष
मस्तक प्रशस्ती
मानवी देहरचनेत मस्तक ही एक देखणी चीज असून, त्याचे स्थानही वरिष्ठ असे आहे. निसर्गाने ज्या अनेक कौतुकपूर्ण रचना केलेल्या आहेत, त्यात मस्तकाला शरीराचा घुमट बनविण्यात कारागिरीची कमाल केली म्हटले तरी चालेल... आपण सहज भाषणात जेव्हा म्हणतो की अमका तमका `माणूस डोक्याचा आहे बरं का` तेव्हा लक्षणेने आपण त्याच्या बुद्धिप्रभावाचीच तारीफ करीत असतो.
- अॅडिसन
मस्तक म्हणजे स्नायुरचनेचे केंद्र. आपला मेंदू तेथेच असतो आणि आपल्या सर्व शरीरावयांच्या थेट माथ्यावर ते असते. म्हणूनच, `मस्तक म्हणजे अजरामर आत्म्याचे मंदिर` असे प्लेटोने म्हटले आहे. मनुष्याच्या सुसंस्कृतपणाचा नि त्याच्या तत्सम जीवनचर्येचा ज्या बुद्धीच्या कसोटीवर आपण अंदाज करीत असतो, त्या बुद्धिमत्तेचे मंदिर मस्तकच होय.
- डॉ. जॉन किट
बायकांच्या मस्तकांवर त्यांच्या हृदयाची हुकमत असते, तर पुरुषांच्या हृदयावर त्यांच्या डोक्यावर प्रभाव चालत असतो.
- डॉ. फुल्लर
कित्येकांची डोकी इतकी लहान चिमुकली असतात की बुद्धी तेथे शिरूच शकत नाही आणि कित्येकांची इतकी लांबरुंद असतात की तसल्या ऐसपैस जागेत सामावेल, अशी बुद्धीच सापडत नाही.
- डॉ. फुल्लर
चेहरा (फेस)
मानवी हृदयातल्या विचारविकारांच्या लहानमोठ्या लहरींचा फोटोग्राफ चेहऱ्यावर उमटत असतो. विकारदर्शन करण्याचे चेहरा एक प्रमुख साधन होय. याचना विनंती करण्याचे आणि वेळी धमकीही देण्याचे साधन होय. सांत्वनाला हाच उपयोगी पडतो आणि शोकाच्या प्रसंगी विविध विकारांच्या भरती ओहोटीची छायाचित्रे हाच दाखवतो. आनंद उत्साहाचा साक्षात्कार हाच पटवतो आणि शरणागती हाच कबूल करतो. चेहऱ्याची ही हजरजबाबी अनेक जिनशी हालचालच श्रोत्यांना कधी उत्साहाने भारून नाचायला लावते, तर कधी विस्फारित डोळ्यांच्या एकाच हुकमतीने त्यांना बंडाला उद्युक्त करते. चेहरा म्हणजे एक शक्ती आहे. हृदयाचे सारे रंग ही शक्तीच व्यक्त करीत असते. माणसाचा चेहरा पाहताच त्याच्या स्वभावाची ओळख पटते. याला अपवादही आहेत. `वान गाईंचा नि करणी कसाबाची` ह्या म्हणीवरुन तसे वाटते.
पण मला इशारा द्यायचा आहे, तो निराळ्याच एका भिकारी प्रकाराबद्दल. गेल्या पाव शतकभर अहिंसावाद, वैरागी वृत्ती, गयावळपणा आणि सदाकष्टी चेहऱ्यांना बराच भाव आल्यामुळे, महाराष्ट्राच्या मर्द संस्कृतीवर त्यांचा वाईट परिणाम झाला आहे. जो सदा दुर्मुखलेला, कष्टी, काही तरी कसे तरी नेसूचे नेसलेला, अंगावर एखादे पटकूर, दाढी हजामत वाढलेली, असले वक्ते जनतेचे पुढारी मोक्षदाते म्हणून बरेच बोकाळले होते. पुढारी म्हटला म्हणजे तो असाच असला पाहिजे, असे आजकाल त्या पिढीतून मोठे झालेले बरेचसे वक्ते गयावळ्या नि दुर्मुखलेल्या सुतकी चेहऱ्यांनी व्यासपीठे दुषविताना आढळतात. दुर्मुखलेला चेहरा म्हणजे विनयाची साक्ष, असा त्यांचा समज झालेला असावा. एरवी ते कितीही मोठे असले, अथवा स्वतःला तसे समजत असले, तरी चेहऱ्यांच्या असल्या नाटकी देखाव्याने जनता फसणारी नव्हे, हे ध्यानात घेऊन, त्यांनी आपल्या सदाकष्टी चेहऱ्यांची ती खोड टाकून दिलेली बरी.
डोळ्यांचे सामर्थ्य
मस्तक आणि चेहरा यांचे महत्त्व सांगितले. पण समजा, डोळेच नसते तर चेहऱ्याची अवस्था कशी काय दिसली असती? सर्व प्राणीमात्रांच्या डोळ्यांपेक्षा माणसांच्या डोळ्यांचे सौदर्य अगदी `डोळ्यात भरण्यासारखे` विशेष असते. इतर पशुपक्ष्यांचे डोळे कमी देखणे अथवा सुंदर असतात, असे नव्हे, आपापल्या परीने तेही अनेक बाबतीत देखणे असतात. गरुडाच्या डोळ्यांची वर्णने आपण खूप वाचतो ऐकतो, पण गरुड सहसा कोणी पाहिलेला नसतो. गरुडाच्या डोळ्यांची चमक धीट, जलाल आणि धमकदार असते म्हणतात. अनेक गोऱ्या पाश्चात्त्य वखारदारांनी आणि फिरस्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यांचे वर्णन `गरुडनेत्री` असेच केलेले आहे. बाळांचे डोळे टपोरे, शांत नि पिंगट असतात. हिरवट, निळसर झाकेचे मांजराचे मिश्किल डोळे पहा. सूर्याच्या उदयास्तानुसार त्या डोळ्यांच्या चमकेची चंद्रकलेसारखी क्षय आणि वृद्धी होत असते. चिमणीचे चलाख डोळे आणि कोल्ह्याची चंद्रकलेसारखी क्षय आणि वृद्धी होत असते.
चिमणीचे चलाख डोळे आणि कोल्ह्याची लफंगी नजर देखणी नसते, असे कोण म्हणेल? आणि उंदीरमामा? त्यांचा तो चकाकणारा काळ्या बुबुळाचा डोळा किती टेहाळणीदार असतो! बेडूक कितीही बदसूरत आणि किळसवाणा असला तरी निसर्गाने त्यालाही हिरकणीसारखी चमकदार नजर दिलेली आहे. माणसाच्या डोळ्यात आणि घोडा, कुत्रा या पाळीव जनावरांच्या डोळ्यात समजूतदारपणा नि प्रेमळपणा जवळजवळ सारखाच असतो. प्रत्येक प्राणीमात्राच्या डोळ्यात काही ना काही तरी आकर्षणाची खुमारी असतेच असते. तरीही माणसाच्या डोळ्यातली शतपैलू खुमारी काही औरच असते. त्या खुमारीतही आत्मप्रतिष्ठेची एक विशेष झलक असते. समोरासमोर जवळ असताना जशी ती झलक आपल्या प्रत्ययाला येते, थेट अगदी तशीच त्या व्यक्ती दूर गेल्या तरी अनुभवता येते. डोळे नसते तर चेहऱ्याचेच काय, पण मानवी अस्तित्वाचेच माहात्म्य शून्य असते.
डोळ्यांचे सामर्थ्य हरजिनशी असून शिवाय ते हजरबाबीही आहे. मितहास्याचे कार्य कोण करतो? ओठ? छे छे ते कार्य डोळे करतात, ऐकण्याचे कार्य डोळेच करतात, कान नव्हे. तिरस्कार कोण दर्शवितो? भुवया? नाही. नाही. तिरस्काराची पहिली ठिणगी डोळ्यातूनच चमकते. शोकाचा आवेगा आपल्या आवाजातून प्रगट होत नसून, तो डोळेच व्यक्त करतात. आपल्या कर्मेन्द्रियांचा नि भावनांचा ओघ डोळ्यांकडे सारखा वाहत असतो. त्यांचा आविष्कर डोळेच काय करू शकतात. डोळा हे केवळ एक इंद्रिय नव्हे तर आपले व्यक्तिमत्त्व साक्षात दर्शविणारे केंद्रस्थानच होय. शरीराचा एक अवयव तर खराच, पण माणसाच्या यच्चयावत् उच्चार, विचार, आचारांची स्पष्ट चित्रे दाखविणारा चंदेरी पडदाच म्हटले तरी चालेल.
केवळ `डोळे` या विषयावर पौर्वात्य नि पाश्चिमात्य शेकडो महाकविजनांनी, तत्त्वज्ञान्यांनी, साहित्यकारांनी आणि सुभाषितकारांनी विस्तीर्ण साहित्याची बरसात केलेली आढळते. साध्या निरीक्षण संभाषणापासून तो थेट योगसाधनापर्यंतच्या व्यासंगात डोळ्यांचे स्थान नि माहात्म्य आगळेच आहे. तमाशे, नाटके, सिनेमा, रंगचित्रे, फोटोग्राफ यातल्या नटनट्यादी व्यक्ती पाहताना आपले डोळे सर्वप्रथम त्यांच्या डोळ्यांकडेच वेधले जाता नेमक्या त्याच ठिकाणी आपल्याला त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची, विकार, अभिनयाची, भावनांची आणि अविर्भावाची किंमत ठरवता येते. सगळ्यांचे डोळे काही सारखे नसतात. उत्फुल्ल डोळ्यांनी माणसे फार थोडी. त्यातल्या त्यात समोर येणाऱ्या माणसावर पहिल्या नजरेतच बेछुट छाप पाडणारे डोळे विरळा. हरिणाक्षी हजारात एखादीच. गरुडाक्ष पुरुषांचा प्रकार तोच.
विकाराभिनयात डोळ्यांची हालचाल
आनंद, भीती, आचर्य - पूर्ण उघडलेले.
मूर्छना - साफ मिटले जातात.
तिरस्कार, चिकित्सा - अर्धे मिटले जातात.
प्रार्थना, शरणागती - डोळे व त्यांच्या बाहुल्याही वर जातात.
आदर, विनय - त्या खाली होतात.
मत्सर, असूया, प्रशंसा - दृष्टी तिर्यक (तिरकस) होते.
डोळ्यांची एक भाषाच असते
तिला नेत्रपल्लवी म्हणतात, शकुंतलेच्या विरहाने दुष्यंत व्याकुळ झाला तेव्हा तो विदुषकाला म्हणतों
...मग दीन नेत्रिं मजचि बघे अश्रुंच्या वियोगे
मज रे, तोचि नेत्र टोचितसे हृदयिं जसा भाला
डोळ्यांनी येथे भाला फेकीचे काम केले आहे. `नका टाकूनि जाऊ` हा भाव दर्शविताना विरहिणी `डावा डोळा पाण्याने माझा भरला` हा जो भाव व्यक्त करते, ती भाषाच नव्हे काय? क्रांतिकारी नरपुंगवांच्या तोडून निर्वाणीचा किंवा हुकमतीचा शब्द बाहेर पडण्यापूर्वीच त्यांच्या डोळयातील चमक समोरच्याला त्या भावाचा स्पष्ट आदेश देते. डोळ्यांनी राज्ये कमावली आहेत. मोठमोठ्या मी मी म्हणविणाऱ्या आडदांड बहादरांना जमिनीवर लोटांगणे घालायला लावली आहेत. डोळ्यातील पाण्यांनी उन्मत्त प्रतिस्पर्धाच्या तलवारींना पाणी पाजून त्यांच्या तोडने पाणी पळविले आहे. महमंद पोरीने पृथ्वीराज चौहानाला गफलतीने नि विश्वासघाताने गिरफदार करून आपल्यासमोर आणले, तेव्हा पृथ्वीराजाने त्या कृतप्यावर लालबुंद आग ओकणाऱ्या डोळ्यांची जी पहिलीच नजर फेकली. त्याने घोरी इतका भेदरला की त्याने तात्काळ त्याचे डोळे फोडण्याचा हुकूम दिला. मुलाखतीला आलेल्या इसमाशी शिवाजी महाराज कसे वागत असत, याची अशी माहिती आढळते. समोरच्याला ते मनमुराद बोलू देत. त्या वेळी ते आपला चेहरा नि डोळे बाजूला फिरवीत आणि जबाब द्यायची वेळ आली का एकदम चेहरा फिरवून त्याच्या डोळ्यांना आपले डोळे भिडवीत महलराज मितभाषी होते. शब्दांपेक्षा त्यांचे डोळे फार बोलत हिज आईज टॉक्ड व्हॉल्यूम्स), असे एका डब मुलाखत्याने म्हटले आहे.
नेत्रसामर्थ्याची आवश्यकता
येथवरच्या प्रवचनावरून वक्त्याला नेत्रसामर्थ्याची किती आवश्यकता आहे. हे नीट ध्यानात येईल. डोळे म्हणजे आत्म मंदिराच्या खिडक्या वक्त्यांच्या संस्कृतीची, आत्मविश्वासाची आणि व्यक्तिमत्त्वाची किरणे याच खिडक्यांतून श्रोत्यांवर पडावयाची असतात. वक्ता व्यासपीठावर येऊन उभा राहताच त्याची जी पहिली नजरफेक श्रोत्यांवर फेकली जाते, तीच त्याच्या आत्मविश्वासाची आणि व्यक्तिमत्वाची पहिली छाप बसवते. श्रोत्यांचा आदर नि विश्वास पटकावण्याचा हाच क्षण असतो. येथे वक्ता फसला का फसला.
हे सामर्थ्य वाढविता येते
पोपटाला जसे हळूहळू शिकवून बोलका बनवता येते, तसे डोळ्यांनाही सावकाश तालमीने कदरवाज बनवता येते. पद्धतशीर नि अखंड तालमीने एकदा का डोळे रोखीव, उत्फुल्ल नि हजरजवाबी बनले म्हणजे त्यांच्या प्रभावाची विलक्षण सीमा अनुभवाला येते. असल्या डोळ्यांची उपयुक्तता केवढी प्रचंड असते, ह्याची जाणीव बाळगणारा हजारात क्वचित एखादाच आढळावा, याचे वाईट वाटते. पुष्कळांना वाटते, निसर्गापुढे आपले काय चालणार? आहेत त्या संकुचित किंवा पिचक्या डोळ्यांनी भागवून घेतले पाहिजे. ही गैरसमजूत आहे. अपायाला उपाय असतोच असतो. आजकाल नकली नाके सुद्धा प्लास्टिक शस्त्रक्रियेने जर चाफेकळीसारखी सुंदर बनवता येतात, तर काही ठराविक व्यायामाच्या तालमीने दुबळे डोळे रोखीव नि चमकदार का बनवता येणार नाहित?
नेत्रसामर्थ्यासाठी त्राटकाची शिफारस
उगवत्या सूर्यबिंबाकडे आणि कडक उन्हातील मध्यान्हीच्या प्रखर सूर्याकडे, डोळे किंचितही न पिलपिलविता टक लावून पाहणारे काही लोक पुष्कळांनी पाहिले असतील. योगसाधनातील तो एक प्रकार आहे. पण वक्तृत्वशास्त्राच्या अभ्यासकांनी तसल्या भानगडीत पडण्याचे कारण नाही. किंचितही न पिलपिलवता समोरच्या माणसाकडे उत्फुल्ल नजर रोखून पाहणे, हा डोळ्यांचे सामर्थ्य वाढविण्यातला मुख्य हेतू आहे. तो `त्राटक` नावाच्या प्रयोगाने साध्य होण्यासारखा आहे. तो असा करावा
एक स्वच्छ पांढरा कागद चिकटविलेला पुठ्ठा तयार करावा. त्यावर मधोमध सुमारे चांदीच्या जुन्या चवलीएवढा वाटोळा गरगरीत ठिपका काळ्या रंगात काढावा. तो तक्ता सुमारे १२ फूट अंतरावर नजरेशी समांतर भिंतीवर टांगावा आणि आपण निहल चिताने त्या ठिपक्यावर नजर रोखून धरावी. प्रारंभाला मिनिटा दोन मिनिटांतच डोळे पिलपिलतील आणि पाणीही येऊ लागेल. डोळे पुसून पुन्हा प्रयोगाला सुरुवात करावी. रोज साधारण अर्धा तास हा प्रयोग करीत जावा. आस्ते आस्ते पिपपिलणे कमी कमी होत जाईल आणि नजरेच्या रोखणीचा काळ वाढत जाईल. काही दिवसांनी त्या ठिपक्याचा आकार कमी कमी करीत जावे. अखेर हरभऱ्याच्या दाण्याइतका ठेवून प्रयोग चालूच ठेवावा. हा त्राटक प्रयोग नजर विस्फारित आणि ठाम रोखीव बनत जाईल आणि डोळ्यांनाही एक प्रकारे तेज येईल.
नाक आणि नाकपुड्या
चेहऱ्याचे प्रधान भूषण नाक, नाक नसेल किंवा नसले तर मानवी देहाला काही कळाच उरणार नाही. चेहऱ्याची सारी मदार नाकावर "नासाभूषणातामुपैति सखि ते बिम्बाधरापेक्षया” सुभाषितकारांनी बिम्बाधरांपेक्षा नाकाला एवढे महत्व दिलेले आहे आणि ते अगदी वाजवी आहे. `नाक` शब्दाचा अर्थच मुळी `प्रमुख` असा आहे. अमूक तमूक महाशय आमच्या समाजाचे नाक आहेत, म्हणजे भरवशाचे पुढारी आहेत. नाकावरूनच `नाके` आणि `नाकेदार` हे शब्द रूढ झाले. महार जमातीतील पुरुषांच्या नावापुढे वापरण्यात येत असलेला `नाक` हा शब्द `पंत, राव साहेब` पालुपदाप्रमाणेच आदरार्थी वापरतात.
नाकाला काही हालचाल नसली तरी विकारदर्शनात नाकपुड्यांचा भाग कमी महत्वाचा नाही. नाकपुड्या आणि नाकाची बोडी यांचीही एक मूक भाषा असते. स्वीवर्ग त्या भाषेचा फार उपयोग करतो. `नाक वर करून बोलू नकोस`, `झालं फुगलं नाक? नाही आमची कल्पना पसंत? दिली सोडून, `एवढं नाक फेंदरायला काय झालं? नाहीच तुम्हाला माझं काही आवडायचं` इत्यादी भाषा आपण नेहमी ऐकतोच ना? हा सारा नाकपुड्यांच्या विविध हालचालीच्या मूकभाषेचाच परिणाम. भीती आणि चीडखोरपणा दाखवताना नाकपुड्या फुगतात आणि तिरस्कार दर्शविताना त्या वर उचलल्या जातात.
नाकाच्या निरनिराळ्या ठेवणीवरून त्या त्या माणसाचा स्वभाव चटकन अजमावता येतो-
- सरळ पण धारदार नाकाचा माणूस पटकन रागवतो.
- जाडजूड नि बसक्या नाकाचा आसामी नाठाळ नि कुरापत्या समजावा.
- प्रफुल्ल भरीव पण (सिंह आणि मोलोशियन कुत्र्यासारखे) सपाट नाक असणारी माणसे घडाडीची आणि उद्धट स्वभावाची असतात.
- टोकदार पोपटी (शुकनासिका) आणि गरुडनाकी मंडळी दिलदार, उमद्या राजेशाही स्वभावाची असतात. पण,
- ज्या इसमाच्या नाकाची बोंडी कोणत्या तरी एका बाजुला कलंडलेली असते, किंचित वळलेली असते, तो माणूस घातपात्या असला पाहिजे. नाक आणि कपाळ यातला खळगा (बिज) बुजलेला असलेली माणसे पाताळयंत्री असतात.
ओठ :
जगातल्या यच्चयावत् कविजनांनी या बिम्बाधरावर वर्णनांचा अमाप फुलोरा चढविलेला आहे. माणूस आपल्यासमोर येताच पहिल्या प्रथम आपल्याला त्याच्या स्वच्छ दंतपंक्तीचे दर्शन होते. घाणेरड्या, रंगलेल्या, किडलेल्या, बुरसलेल्या दातांचा कोणी का असे ना, कितीही थोर नि विद्वान असे ना, त्यांचे ते तसले दात दिसताच किळस तर येतोच, पण त्या माणसाविषयीचा आदर नि आपलेपणाही डळमळतो. स्वच्छ दंतपंक्तीचे प्रथम दर्शन आपल्या व्यक्तिमत्वाचे (पर्सनॅलिटीचे) मोठे भांडवल आहे. पण त्या दंतपंक्ती प्रकट होताना दोन्ही ओठ किती सफाईत नि हळुवार उघडले जातात, यावर तिचे सारे आकर्षण अवलंबून असते. ओठांच्या त्या हालचालींना गालांवर उमटणाऱ्या वळ्या खळ्यांवर आपल्या स्वभावाचे पहिले दर्शन होत असते. विश्रांतीच्या आणि शांत वृत्तीच्या वेळी ओठ झाकलेले असतात. आश्चर्य किंवा कौतुकाच्या वेळी अर्धवट उघडे राहतात. आनंद विनय किंवा विनोदाच्या वेळी साफ उघडे होतात. खेद किंवा दुःख दाखविताना ते खाली वळतात. असंतोषाच्या वेळी पसरले जातात आणि क्रोध, धि:कार आणि निश्चयाच्या वेळी दातांनी दाबले जातात. ओठांच्या वळणांची, दावणीची आणि मुरडणीचीही एक मूकभाषा आहे आणि तोंडातून चकार शब्दही न काढता ती व्यक्त होत असते.
शरीर-देह :
ह्याची रचना काही कुणाच्या हातची नसते. कौटुंबिक आनुवांशिकतेचा तो पारिपाक असतो. सडपातळपणापासून तो हत्तीछाप कणग्यापर्यंत अनेक प्रकार असतात. तरीही सभास्थानी येऊन साहजिकपणे उभे राहणे प्रत्येकाला साधणारे आहे. त्या ठाणमांडावरुन वक्त्याच्या नैसर्गिक स्वभावधर्माचा श्रोत्यांना प्रथमपरिचय होत असतो. `मनोविकार म्हणजे देहाचे आवाज` अशी रुसोने व्याख्या केली आहे. ते व्यक्त करण्याच्या कामी देहाच्या सर्व अवयवांची हालचाल शिस्तबद्ध व्हावी. ह्या बाजूवरून त्या बाजूला वळायचे असेल तर नुसती मान फिरवून भागत नाही. कंबरेपासून ते वळण सहजगत्या घेतलेले बरे.
बाहू (खांद्यापासून हातांच्या टोकापर्यंतचा भाग) :
बोलताना बाहू सरळ असावे. कोपरांपाशी वाकवू नयेत. उच्चारल्या जाणाऱ्या प्रत्येक शब्दाबरोबर हातवारे केलेच पाहिजे असा काही नियम नाही. पण कित्येक वक्ते दोन्ही हातांची इतकी वारेमाप हालचाल करतात, की तो बोलत आहे का तोंडासमोर घोंगवणाऱ्या माशाचिलटांना झाडीत आहे, असा देखील दिसतो. शाळांतील लहान मुलामुलींना एखाद्या समारंभात म्हणण्यासाठी गाण्याची तालीम देतात. तेव्हा प्रत्येक शब्दाचा अर्थ साभिनय दाखविण्यासाठी गायनाचे तालीम मास्तर उगाच भरमसाट हातवारे करायला शिकवितात. `काय तुझ्या मनात` ओळ गाताना हाताचा पंजा छातीवर घट्ट ठेवायचा आणि `सांग माझ्या कानात` ओळ आली का गेलीच मुलामुलींची बोटे त्यांच्या कानात. हा आचरटपणा समारंभाचे गांभीर्य आणि गाण्यातला विचार नि विकारही बिघडवून टाकतो.
हाताचा पंजा आणि बोटे :
त्यांचीही एक विशेष मूकभाषा असते. रस्त्यावर वाहनांची आवकजावक नियंत्रित करणाऱ्या पोलीसाचे पंजे नि बोटेच कसे हुकमी काम करीत असतात, ते सगळ्यांना माहीत आहेच. तेथे शब्दांचे कामच पडत नाही. बोलतानासुद्धा नुसत्या पंज्याच्या प्रदर्शनाने कित्येक शब्दांचा उच्चारही करावा लागत नाही. समजा, एखाद्या व्यक्तीविषयी तीव्र संताप व्यक्त करावयाचा असला तर "अशा माणसाला चव्हाट्यावर आणून" एवढे वाक्य होताच मुस्काटात भडकविण्याच्या आविर्भावाचा उजव्या हाताचा पंजा उगारताच बत्तिशी पाडली पाहिजे` या वाक्यापूर्वीचे `थोबाड फोडून` हे शब्द उच्चारण्याची गरज पडत नाही. हाताच्या पंज्याच्या निरनिराळ्या हालचाली अनेक विकारही प्रदर्शित करतात.
उताणा हात :
हाताचा तळवा वर करून दाखविला असता सद्विचार, मनाचा मोकळेपणा आणि एखाद्या घटनेची सत्यता व्यक्त होते. (उदाहरणासाठी खालचे वाक्य सभिनय बोलून पाहा.) "मऱ्हाठी माणसाला आज कशाची विशेष जरुर असेल तर ती स्वाभिमानाची होय. स्वाभिमान बळावला तरच राष्ट्राभिमानाचे पांग फेडण्याची त्याला स्फूर्ती होईल. हा विचार बळावला आहे, म्हणूनच आज या ठिकाणी हा लाखोगणती भगिनीबांधवांचा मराठमोळा समाज एकदिल, एकजूट जमला आहे."
तळवा खाली असलेला पंजा :
एका मुद्याचा दुसऱ्या मुद्याशी असलेला संबंध दाखवतो. पंजा वरून खाली आणला तर तो मूक आशीर्वाददर्शक ठरतो.
उलटा पंजा :
(हात वाकडा करून तळवा उलट्या बाजूला केला) तर एखादी गोष्ट झिडकारणे, त्याज्य ठरविणे, विरोध दर्शविणे किंवा प्रतिकूल विचार व्यक्त करणे,
सूचकांगुली (आंगठ्याजवळील) :
एखादा मुद्दा ठासून सांगणे किंवा त्याचे महत्त्व दर्शविण्यासाठी ते बोट कटाक्षाने दाखविले जाते.
बद्धमुष्टी :
हाताची घट्ट मूठ क्रोध, धि:कार आणि वज्रनिश्चयाची द्योतक ठरते.
`दोन्ही कर जोडोन` :
`मार्मिक` साप्ताहिकातला हा मथळा आता सर्वपरिचित झालेला आहे. याचे अनेक अर्थ लावता येतात. १. प्रमाण २. माफ करा साहेब, धन्य आहात आपण, ३. रजा घेता? येत जा असेच ४. प्रार्थना विनंती ५. या या आपलीच वाट पाहात होतो. ६. त्या माणसाच्या कारस्थानापुढे हात टेकले युवा. ७. अशीच आपली सगळ्यांची कृप असावी आमच्यावर इत्यादी.
हाताची बोटे :
डोळ्यांची जशी नेपल्लवी ही मूक भाषा आहे, तशी बोटांचीही एक करपल्लवी नामक मूकभाषा आहे. जुन्या जमान्यात काही नंदी बैलवाले आणि समेळ तुणतुण्यावर देवांची गाणी म्हणणारे भटकने लोक गावोगाव नि दारोदार येत असत. लोक त्यांना कोणत्या तरी देवाच्या नावाने दिडकी पैसा देत असत आणि आपले नावही त्यातल्या एकाला गुपचूप सांगत असत. मग तो इसम लांब दूर उभे असलेल्या आपल्या सवंगड्यांना करपल्लवीने बोटांच्या खुणा करीत असे. हा प्रयोग झाला का ते समोरचे सर्वगजडी समेळ वाजवून मोठ्याने ओरडून सांगत असत. "दाजी पाटलाने मातुसरी जणाबाईच्या नावाने खंडोबाला वाहिलेली दिडकी पावली होऽऽ" सभोवार जमलेल्या लोकांना त्या चमत्काराचे नवल वाटायचे आणि ते भराभर त्या करपल्लवीवाल्यांवर पैशांची उधळण करायचे.
नाकाच्या बॉडीवर बोट ठेवले का "चूप रहा, करू...बोलू नकोस" असा समोरच्याला इशारा होतो. घड्याळाच्या लंबकाप्रमाणे तर्जनी हवेत हलवली का "नाही नाही, असे होणार नाही" हा नकार कटाक्षाने व्यक्त होतो. ओठांवर बोट ठेवले का "चूप बस." तर्जनी एखाद्याकडे रोखून "हा पाहा तो इसम" असे मुकाट सांगता येते. कानशिलाच्या वर तर्जनी टेकून "याला अक्कल लागते" किंवा "याचे हे जागेवर नाही" असेही दर्शविता येते. बोटांच्या या विविध हालचाली अगदी सहज घडत असतात.
पाय :
कोठेही पहा, सामान्यतः पुरुषाचा पाय उजवा आणि बायकांचा डावा नेहमी पुढे असतो. अलीकडे सर्वोदयी फिसाट निघाल्यापासून कित्येक वक्ते सभास्थानी येताच विठोबासारखे दोनी पाय घट्ट जुळवून उभे राहतात. विनयातिरेकाच तो भाव, अशी त्यांनी आपली समजूत करून घेतलेली असते. पण तो असतो बेंगरुळपणा. साहजिकतेपेक्षा त्यात ओढूनताणून आणलेली `आम्ही कुणीतरी निराळे` अशी कृत्रिम झाक स्पष्ट दिसते. उजवा पाय पुढे ठेवून केलेला प्रवेश पुरुषाचा मर्दपणा जसा दाखवतो, तसा बायकांचा डावा पाय त्यांच्या शालीनतेचा उसा उमटवितो. व्यासपीठावर उभे असताना कित्येकांना दोन्ही पाय सारखी हलवीत ठेवण्याची वाईट सवय असते. ती टाळावी.
सामान्य सूचना :
- एकाच हाताचा वापर करू नका.
- कशालाही टेकू नका.
- हातरुमालाचा उपयोग जरूर तितकाच करा.
- बोलत असताना कोटाची बटणे सोडणे नि पुन्हा लावीत रहाणे, हा चाळा वर्ज्य करा.
- खांदे उडवू नका.
- माफी मागण्याचे पेव फोडू नका. आपले विचार ठाशीव नि अनुभविक असतील तर क्षमायाचनेची जरूरच नाही.
- श्रोत्यांच्या डोळ्यांना डोळा भिडवूनच बोला.
- हात पाठीमागे ठेवू नका. हातांची मिठी पुढे धरू नका.
- दोन्ही बाजूंना हातांचा फडफडाट करू नका. बोलताना हात घड्याळाच्या साखळीत, बटणाच्या भोकात किंवा पाटलोणीच्या खिशात अडकवू नका.
कीर्तनकार म्हणजे ज्यांना आपण हरिदास म्हणतो ते. महाराष्ट्रातील लोकजागृतीची आणि लोकशिक्षणाची ही एक सामर्थ्यवान शक्ती होती. भगवद्भक्तीच्या निरूपणाने एके काळी हरिदास मंडळींनी अब्राम्हण शूद्रादी मऱ्हाठी समाजाचे अपरंपार प्रबोधन करून, त्यांना देवभक्तीबरोबरच देशभक्तीचे नि व्यवहारज्ञानाचे शिक्षण देण्याची फार मोठी कामगिरी बजावलेली आहे. आज हरिदासांची ही संस्था नि परंपरा कशीबशी टिकून राहिली आहे. गुरुपरंपरेच्या प्रसादाने प्रज्ञावंत झालेल्या जुन्या पठडीच्या रसाळ कीर्तनकारांची साग्रसंगीत कीर्तने आता कोठे फारशी होत नाहीत. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या टिमक्या पिटणाऱ्यांनाही त्यांच्या सांस्कृतिक सेवेची आठवण होत नाही. पुणे शहराने कीर्तनसंस्था बरीच टिकवून धरली आहे आणि पुण्याच्या आकाशवाणीने दर रविवारी नव्या-जुन्या कीर्तनकारांच्या कीर्तनांचा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
उत्कृष्ट कीर्तनकार होण्यासाठी शिष्याने कोणकोणते गुण परिश्रणाने अंगी बाणावे लागतात, त्याचे समर्थ रामदास यांनी दासबोधाच्या ४थ्या दशकाच्या २ऱ्या समासात फार छान निरुपण केले आहे.
बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, नित्य नवा हव्यास धरावा, कथा-अन्वय (कथेचा धागा संबंध न सोडता भाषण करावे.) लापणिका (विवेचन), नामघोष करताळिका, प्रसंगी बोलाव्या अनेका, घातमान नेमस्त (घात म्हणजे कल्पित गोष्टी आणि मान म्हणजे घडलेल्या गोष्टी, थोडक्यात मधून मधून सांगाव्या), पदे, दोहडे (दोहरे), श्लोक, प्रबंध, घाटी मुद्रा अनेक छंद, वीर भाटीव विनोद प्रसंग करावे. (वीररसात्मक भाषणे नि सभ्य विनोद प्रसंगानुरूप करावे. नाना नवरसिक शृंगारिक गद्यपद्याचे कौतुक, नाना वचने प्रस्ताविक शास्वाधारे बोलावी. पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत निरुपण करावे नेमस्त बहुधा बोलणे अव्यवस्त बोलोचि नये.
हरिदासाचा पेशा पत्करू इच्छिणाऱ्या शिष्याला स्वाध्यायाचे, पाठांतराचे आणि कंठान्तराचे डोंगरच्या डोंगर पालथे घालावे लागतात. रामायणा महाभारतातील शेकडो आख्याने, अनेक पौराणिक कथा, निरनिराळ्या आख्यानांवरील प्राचीन आर्वाचीन कवीची काव्ये, सुभाषिते, मुखोद्गत करावी लागतात. इतिहासातील लोकोत्तर घटनांचा संग्रह हुकमी संग्रही ठेवावा लागतो. शिवाय, प्रवचनात अधूनमधून हास्याची खसखस पिकविण्यासाठी विनोदी चुटके, म्हणी, कल्पित गोष्टी पेराव्या लागतात. एकनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, वामन पंडित, रामदास, मुक्तेश्वर, श्रीधर, महिपती या प्राचीन थोर संतकवीच्या काव्यरचनांचा नुसता आस्वाद घेऊन चालत नाही. तर त्यांच्या निवडक ओव्या, अभंग, वृत्तात्मक कविता मुखोद्गत कराव्या लागतात.
मोरोपंतांनी समग्र महाभारत आणि रामायण आपल्या अजरामर आर्यावृतात गुंफून ठेवले आहे. बहुतेक हरिदास आपल्या प्रवचनात `पंत काय म्हणतात` अशा झोकात मोरोपंती आर्याचा मीठ मसाल्यासारखा मनस्वी उपयोग करतात. रामजोशी, अनंतफंदी, होनाजी बाळा इत्यादी शाहिरांच्या तात्त्विक आणि शृगांरिकही लावण्या जिभेवर अगदी नाचत्या ठेवल्या पाहिजेत. हरिदास हा उत्तम वक्ता तर असावाच लागतो, पण त्याचे मुख्य भांडवल जे धन्य ते गायनी कला ही तर अगत्यमेव पाहिजे. ती शास्त्रशुद्ध कमावण्यासाठी तज्ज्ञगुरुपाशी वर्षानुवर्षे तंबोऱ्यात झणत्काराबरोबर घशाची घासणी करावी लागते. असा "गायनवक्तृत्वाचा अधिकार, अल्पास नघडे प्रत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार, अनुभवाचा."
प्रस्तावना, निरुपण (म्हणजे पौराणिक किंवा ऐतिहासिक घटना, कथा, आख्यान ह्यांवर गद्य-पद्य मिश्रित सांग्रसंगीत प्रवचन) आणि शेवटी समारोप अशा तीन तण्यांनी हरिदास आपल्या कीर्तनाची सांगता करतात. प्रस्तावनेला तुकारामाचा, नामदेवाचा किंवा ज्ञानोबाचा एखादा अभंग घेऊन त्यावर तात्त्विक विवेचन करतात. हरिदासबुवा आज कोणते आख्यान लावणार त्याचे सूतोवाच येथेच होते. नंतर आख्यान. त्यांच्या विवेचनात मोरोपंती आर्याचा मसाला तर असायचाच, पण त्या आख्यानावर जुन्या कवींनी रचलेल्या पद्यांचा भरपूर आविष्कार करूनच हरिदास कथेला रंग भरतात. अधूनमधून बहुतेक सर्व संतांच्या वचनांचा समयोचित सत्कार चुकायचा नाही. ह्या आख्यान निरुपणात शृगांर, वीर, करुणादी नऊ रसांचे असे काही भरघोस दर्शन घडवून हरिदास आबालवृद्ध श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडतात का सारी सभा नागासारखी डोलू लागते. कथेचा समारोपही थोडक्यात पण सुटसुटीत करताना प्रथमारंभी घेतलेल्या अभंगाला भैरवी रागात आळवून कथेची समाप्ती करतात.
कीर्तनकार हरिदासांच्या बरोबर पुराणिकांचे स्थान आहे. त्याला गायनकला अवगत नसली (आणि ती नकोही असते) तरी वक्तृत्वकलेत मात्र तो तरबेज असावाच लागतो. समोर असलेल्या पोथीतील शब्द वाचून त्याच्या अर्थाचे श्रोत्यांपुढे त्याला विवरण करावयाचे असते. या विवरणातही विशेष स्पष्टीकरणासाची अनेक म्हणी, चुटके, विनोदी गोष्टी, छोट्या कल्पित गोष्टी किंवा प्राचीन कवींच्या काव्यातील काही अवतरणे समयोचित बोलून त्यालाही आपल्या या प्रवचनात उत्तमरंग भरता येतो. लोकांची मने आकर्षित करून आपले काही सिद्धांत त्यांच्या गळी उतरविण्याची कला म्हणजेच वक्तृत्वकला. ती साध्य करण्यासाठी अभ्यासाची, निरीक्षणाची, परीक्षणाची आणि विश्लेषणाची केवढी तपस्या करणे जरुर आहे हे एवढ्या विवेचनावरुन पटावे अशी अपेक्षा आहे.
स्मरणशक्तीचा विकास
एका विसरभोळ्या माणसाची गोष्ट सांगतात. आपण काय वाचले हे त्याला ५-१० मिनिटांनी मुळीच आठवत नसे. एका मित्राला त्याचा हा पोकळ डोक्येपणा चांगला ठाव होता.त्याला त्याने एकच पुस्तक नवीन म्हणून सात वेळा वाचायला दिले आणि अखेर विचारले, "काय? कसं काय आहे पुस्तक" त्यावर तो गृहस्थ म्हणाला- “पुस्तक छान लिहिलं आहे पण लेकाच्याला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगण्याची वाईट खोड आहे." तरतरीत स्मरणशक्ती माणसाच्या जीवनाचे एक मोठे भांडवल आहे. वक्ता होऊ पाहणाऱ्या स्मरणशक्ती एखाद्या यंत्राप्रमाणे चक्क नि चोख ठेवणे जरुर आहे. बिजलीचे बटण दाबताच जसा झटकन दिवा लागता अगर पंखा चालू होतो तशी ती आपल्या ज्या अगणित प्रवृती आहेत, त्यात स्मरणशक्ती प्रथम उमलते आणि कोमेजते तीही प्रथमच आपल्या अभ्यासाची चिंतन मननाची आणि निरीक्षणाची सवय जर पद्धशीर असेल तर ती स्मृतिविकसनाच्या कामी फार उपयोगी पडते.
सर्वच विषयांची सर्वांना गोडी अथवा आवड असतेच असे नाही. आपला विषय निवडणे हे सुद्ध मित्र निवडण्याइतके कौशल्याचे काम आहे. एकाच वेळी नवीन विषयाचे अथवा ज्ञानाचे ठराविक प्रमाणच नीट पचनी पडत. स्मरणात तर अगदी थोडे राहते आणि वाचून टाकली भराभर दोनशे पृष्ठे त्याचा काय फायदा? स्मरणशक्ती एखाद्या पिशवीसारखी असते. काठोकाठ भरली तर मिटता येतनाही आणि भरलेले आठवणीचे दाणे सांडून जातात. म्हणून `पचेल ते आणि तितकेच खावे` या म्हणीची नेहमी आठवण असू द्यावी. जुन्या जमान्यात भोजनाच्या पंगती बसल्या म्हणजे यजमान भोजनभाऊंना हात जोडून सांगत असत- `मंडळी, सावकाश होऊ द्या.` मग हो काय, मंडळी धीरे धीरे पोटे आकंठ रिचवीत बसायची. सावकाश म्हणजे अगदी चीम्मे धीम्मे पोटाला तड लागेतो गिळण्याची सवलत असा भोजनभाऊ अर्थ लावायचे. त्यातच पुन्हा यजमानांच्या आग्रहाची भर! वास्तविक सावकाश या शब्दाचा खरा अर्थ स + अवकाश म्हणजे अवकाश पोकळी ठेवून, पोटात थोडी रिकामी जागा ठेवून जेवा असा आहे. ज्ञानार्जन करताना ते सुद्धा असेच स+ अवकाश केल्यास स्मरणशक्तीच्या मर्यादेच्या आवाक्यात राहते.
नियमच असा करावा की आपण जे वाचीत आहोत, ऐकत आहोत किंवा निरीक्षण करीत आहोत त्यातल्या तपशीलांचे प्रतिबिंब आपल्या अंतःकरणावर स्वच्छ उमटल्याखेरीज पुढे पाऊलच टाकायचे नाही. वाचीत असलेल्या मजकुरात आपण अगदी गढून जाऊन त्यातल्या विचारांशी, विवेचनाशी आणि कल्पनांशी आपले तादात्म्य झाले पाहिजे. वाङ्मयातील उत्कृष्ट गद्यपद्यात्मक भाग नेहमी वाचून वाचून पाठ करण्याची पद्धती स्मृतिविकसनाच्या कामी बिनमोल उपयोगी पडते. पाठांतर करणे म्हणजे घोकंपट्टी नव्हे. घोकंपट्टीने स्मृतीचा विकास होऊ शकत नाही.
व्याख्यानाची तयारी कशी करावी?
आख्यानासाठी आपल्या आवडीचा विषय निवडला म्हणजे (२) प्रथम त्याविषयी मिळेल त्या साहित्याचा संग्रह करावा. (२) चौकस बुद्धीने त्यातील बऱ्यावाईटाची नीट पारख करून उत्तम मुद्दे थोडक्यात आणि त्या त्या ग्रंथातील पानांचा नि परिच्छेदांचा संदर्भ तपशीलवार स्मरणवहीत टिपून ठेवावा. (३) वरचेवर तो चाळा म्हणजे स्मरणात राहतो आणि व्याख्यानाच्या वेळी हुकमी उपयोगी पडतो.
पुष्कळांना हे साहित्यशोधनाचे काम बिगारवेठ वाटते. पण निवडलेल्या विषयात विद्यार्थ्याला खरोखरच रस असेल तर त्याला असे वाटणार नाही. अनेक प्रांत आवडीच्या विषयाचे ज्ञानबिंदू जेथे जेथे आढळतील. तेथे तेथे तो मधमाशीच्या हौसेने उत्साहाने आणि हिरिरीने झेपावल्याशिवाय राहतच नाही. समोरच्या विषयाचे चिंतन, मनन करीत असताना एखादा नवीन विचार किंवा मुद्दा सुचला का तो ताबडतोब टाचण पुस्तकात नमूद करून ठेवावा. या बाबतीत स्मरणशक्तीच्या तालेवारपणावर भरवसा ठेवू नये, हे काम स्वस्थ मनाने केले पाहिजे. घाईघाईने कसेबसे उरकण्यात अर्थ नाही. आपल्या स्वतःच्या विचारांचा खजिना संपून गेला, त्यात भर घालायला एक कणही उरला नाही, असे वाटताच विद्यार्थ्याने त्या विषयावरील ग्रंथांकडे वळावे. त्यातल्या कल्पना व विचार आपल्या कल्पनांशी आणि विचारांशी कितपत मिळत्या जुळत्या आहेत, त्या पाहाव्यात. चुकलेल्या असतील त्या सुधाराव्या आणि नवीन काही संग्रह मिळत असेल तर तो घ्यावा. इतके करूनही आपण हाती घेतलेल्या विषयात जे लोक जागते, तज्ज्ञ असतील अशा लोकांशी विद्यार्थ्यांनी मुद्दाम भाषणप्रसंग घडवून आणावा.
चर्चा चिकित्सा करावी. त्यांच्या मतांचा कल्पनांचा आणि विचारांचा सारांश काढून, तो आपल्या विचारांशी नीट ताडून पाहावा. असले संभाषणप्रसंग जितके शक्य असतील, तितके घडवून आणण्याचा प्रयत्न दक्षतेने केला पाहिजे, नुसत्या पुस्तकी ज्ञानापेक्षा तयांजवळ मिळणारे ज्ञान सहस्वपट श्रेष्ठ असते. `एकेठायी बैसोन राहिला । तरी मग व्यापचि बुडाला । सावधपणे ज्याला त्याला । भेटी द्यावी ।।` हे समर्थांचे वचन फार विचार करण्यासारखे आहे. बहुजन समाजाच्या हिताहिताच्या प्रश्नांबद्दल चर्चा करण्याची जबाबदारी घेणारे पुढारी वक्ते आपल्या व्यक्तिशः मतांची, लोकांच्या बहुमतांशी नेहमी तुलना करून पाहत असतात. त्यातील भेदांबद्दल ते चांगली भवति न भवति करतात. समाजातील अनेक प्रमुख मंडळींच्या भेटी येऊन भाषणप्रसंगाने त्यांच्या धोरणांचा कल अजमावतात आणि नंतर आपल्या व्याख्यानाची तयारी करतात. बहुजन समाजाच्या विविध भावना नि आचारविचारांकडे पाठ फिरवून व्यक्तिशः मताचे कितीही प्रतिपादन केले तरी ते यशस्वी होत नाही, याकडे लक्ष असावे.
टाचणपुस्तकाचे कार्य
टाचणपुस्तक म्हणजे स्मरणवही. ह्यात आपला प्रत्येक विचार थोडक्यात लिहून ठेवण्याची पद्धत चांगली खरी, पण तिला वाचवीपेक्षा फाजील महत्त्व देणेही बरे नाही. `टाचणवहीपासून फायदे` या सदराखाली लिहिताना रेव्ह स्क्रिव्हर म्हणतात - "टाचणवही म्हणजे पांढऱ्या कागदांचे एक चोपडे. असले एक चोपडे घेऊन जगाच्या प्रवासाला निघा."
प्रकरण १४
मैदान मारून सभेचा फड जिंकावा लागतो
अखंड सावधान रे । प्रयोग प्रेत्न मान रे ।
प्रसंग हा तुफान रे । नकोचि वेवधान रे ।।
मनीं धरूनि धारणा । करा बरी विचारणा।
प्रेत्न मूळ कारणा । अतर्क्य ते विचारणा ।।
- समर्थ रामदास
सभास्थानाची चौकशी
व्याख्यान देण्यासाठी जाण्यापूर्वी सभेच्या स्थानाची संपूर्ण माहिती मिळविणे अगत्याचे आहे. ते स्थान एखादा बंदिस्त हॉल आहे, का पटांगण आहे, का मैदान आहे. हॉल असल्यास तेथे व्यासपीठाची व्यवस्था कशी आहे. तेथे किती श्रोते सामावू शकतात, त्यांच्या बसण्याची व्यवस्था कशी आहे, म्हणजे खुर्च्या बाके आहेत, का पेशवाई बैठकीचा थाट आहे, इत्यादी माहिती असावी. पटांगण किंवा मैदान असल्यास, त्याच्या अवतीभवती इमारतीचा गराडा पडलेला आहे काय, असल्यास, लाऊड स्पीकरचा आवाज तेथे घुमतो किंवा प्रतिध्वनी उमटतो काय, ह्याचा शोध घ्यावा. उच्चारला जाणारा प्रत्येक शब्द जर तेथे घुमत असेल, किंवा त्याचा प्रतिध्वनी उमटत असेल, तर अशा ठिकाणचे कार्यक्रम फारसे यशस्वी होत नाहीत, असा अनुभव आहे. नवथर वक्ता तर भांबावूनच जातो.
श्रोतृवर्गाची सामाजिक पातळी
सभेला येणाऱ्या श्रोतेवर्गाची आगाऊ माहिती अगत्याने काढावी. त्यांच्या विचारांच्या, आकलनाच्या नि समजुतीच्या मर्यादा कोठवर आहेत. आवडीनिवडी काय आहेत, तो वर्ग समाजातल्या कोणत्या थराचा नि पातळीवरचा आहे, ही माहिती मुद्दाम मिळवावी. आपण काय निमित्ताने आणि कोणत्या विषयावर भाषण करण्यासाठी जात आहोत, ती सभा कोणत्या कारणासाठी बोलवण्यात आली आहे, तेथे कोण-कोण आणखी इतर वक्ते येणार आहेत, सार्वजनिक क्षेत्रात त्यांचे स्थान कोणते आहे त्या प्रत्येकाविषयी लोकांचे सर्वसाधारण मत किवा ग्रह काय आहेत, ठरविलेल्या विषयात त्या प्रत्येकाचा काय अधिकार आहे. आपण कोणकोणत्या मुद्यांवर तेथे अभ्यासपूर्ण बोलू शकू. इत्यादी सर्व तपशीलांचा विचार आधी केल्यास फायदेशीर होतो.
हे घ्या दोन दाखले
श्रोतावर्ग कोणत्या घरातला आहे, याची नीट विचारपूस न करता व्याख्यानाचे आमंत्रण स्वीकारणाऱ्या विद्वानांची ऐन वेळी कशी त्रेधातिरपीट उड़ते, त्याची दोन उदाहरणे देतो. एका नामांकित इतिहास संशोधक महाशयांनी गणेशोत्सवात व्याख्यानाचे निमंत्रण स्वीकारले. ते सभास्थानी आले. पाहता तो काय अंदाजे ८ ते १२-१३ वर्षांची ६०-७० शाळकरी पोरे श्रोते म्हणून आलेली. वक्ते महाशय पडले जाडे विद्वान जाडजूड शब्द वापरून गंभीर मुद्रेने भाषण करण्याची त्यांना सवय. समोर सारा पोरवडा किलबिल गोंगाट करीत बसलेला पाहताच ते गांगरले. "हा उत्सव आळीतल्या शाळकरी मुलामुलींचा आहे" असा व्यवस्थापकांनी खुलासा करताच "यांच्यापुढे मी काय कप्पाळ व्याख्यान देऊ?" असे म्हणून स्वारी आली तशी गेली. श्रोते कोण असतील याचा आधीच खुलासा करून न घेतल्यामुळे त्या पंडितांची अशी फसगत झाली.
वक्त्यात नाटयगुण असावा म्हणजे प्रसंगोपात्त पडेल ती भूमिका वठविण्याचे कौशल्य त्याला साधते. इतर अनेक विषयांचा स्वाध्याय केला, पण `मुलांच्या बोलीने बोलावे, त्यांच्या कलाने चालावे` ही समर्थांच्या शिकवणीची कला त्याला नसली म्हणजे ती सारी पुस्तकी विद्या एकांगी नि लंगडी ठरते.
दुसरे उदाहरण. वरळीला शिवजयंती उत्सव होता. एक महान पत्रपंडित वक्ते नि मी अध्यक्ष अशी योजना होती. सभास्थानी आम्ही गेलो. ४००-५०० या समुदाय सभेला आला होता. व्यासपीठाला लागून थेट समोर १०० फुटांपर्यंत ७-८ ते १२-१४ वर्षे वयाच्या मुला मुलींचे खिल्लार गचडी करून बसलेले. मोठी माणसे दूर त्यांच्या मागे आणि काही आजूबाजूला झालरीसारखी उभी हा समुदाय पाहताच पत्रपंडित वक्ते चांगलेच गांगरले. "या लहान मुलांपुढे बोलण्याची नाही युवा माझी तयारी." ते म्हणाले, "अहो, असे घाबरता कशाला? तुम्ही व्हा अध्यक्ष नि मी होतो वक्ता प्रस्तावना नि समारोप के स्तु संध्येसारखा थोडक्यात आटपून काम भागवा म्हणजे झाले." मी धीर दिला. त्यांनी ४-५ वाक्यातच प्रस्तावना आटोपली नि मी बोलायला पुढे सरसावलो. “हे पहा मुलांनो नि मुलींनो, आज मी तुम्हाला काही मजेदार गोष्टी सांगणार आहे बरे का.
`एक होता राजा`च्या गोष्टी वाचल्या आहात ना तुम्ही शाळेत? बस्स, अगदी तश्शाच. गप्प बसाल तर मजा येईल." असा प्रस्ताव करताच गड़बड गोंधळ किलबिल बंद. मग, अगदी मुलांच्या बालबोध भाषेत अधूनमधून त्यांची टवाळी टिंगल करीत, कथानकातील निरनिराळ्या पात्रांची भाषणे त्यांच्या कुणबाऊ भाषेत करून, शिवरायांच्या चरित्रातील ४-५ गोष्टी अभिनयपूर्ण हावभावांनी रंगवून सांगितल्या. एक तास कार्यक्रम झाला नि मी भाषण संपविताच, "आणखी सांगा, आणखी सांगा" असा पोरांचा ओरडा चालू झाला. श्रोत्यांच्या विचार मर्यादा तात्काळ हेरून, त्यांना रुचेल पचेल समजेल अशा भाषण पद्धतीचे प्रसंगावधान राखण्यातच वाक्चातुर्याची शहामत असते.
असले कार्यक्रम कटाक्षाने टाळा
निरनिराळ्या उत्सवात प्रथम एखाद्याचे भाषण आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, मुलामुलींच्या मेळ्याचा कार्यक्रम, जादूचे खेळ किंवा एखाद्या नाटकाचा प्रयोग, असा कार्यक्रम आखतात. त्यामुळे कार्यक्रमाच्या आधी चक्क तास दोन तास बायकामुलांची गर्दी लोटते. नवथर किंवा हौशी वक्त्याला त्या गर्दीचे कौतुक वाटते. पण ती गर्दी व्याख्यानासाठी होत नसून, मागाहूनच्या संगीत रंगीत कार्यक्रमांसाठी असल्यामुळे, व्याख्यान ऐकायला कोणीच तयार नसतो. मुले आरडाओरडा करतात, गोंधळ माजवतात, कार्यकर्ते त्यांना शांत बसविण्याचा वांझोटा खटाटोप करतात आणि अखेर वक्त्याला आपले भाषण बंद करून रस्ता सुधारावा लागतो. यासाठी, माझ्या व्याख्यानानंतर जर आणखी कसलाही कार्यक्रम असला तर मी येणार नाही, असा स्पष्ट करार करावा आणि तेथे गेल्यावर या अटींचे उल्लंघन झालेले आढळले, तर कटाक्षाने व्यासपीठाला स्पर्शही न करता सरळ परत यावे.
वातावरणाची नीट अटकळ बांधा
भावनांच्या कोणत्या वातावरणात जाहीर सभा भरत आहे, याचाही नीट अंदाज घेतला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासारखा, सीमावादासाखा किंवा असाच एखादा सार्वजनिक जीवनातला ज्वलंत प्रश्न असेल, तर सभेला जमणाऱ्या स्त्री-पुरुषांची मनोवृत्ती भावनांच्या कसल्या थरावरची असेल, तेथे येणाऱ्या अनेक वक्त्यांविषयी लोकांचा आदर, विश्वास नि मतांचा कल कोणता असेल, हा सर्व विचार करूनच वक्त्याने त्या तुफानात भाग घेण्याचे ठरवावे. अगदी एक-दोन शेलक्या मुद्यांवरच आपल्या भाषणाची मर्यादा आगाऊ ठरवावी. अशा प्रसंगी भाषणाचे लांबलचक चऱ्हाट वळणारे वक्ते खडाखड खाली बसविले जातात. त्याचप्रमाणे विषयाला सोडून अवान्तर बडबड करणाऱ्यांनाही लोकांचा हुश्श हुश्श प्रसाद खाऊन माघार घ्यावी लागते. अशा सभेत आधीच्या इतर वक्त्यांनी तोवर पुढे न मांडलेल्या ठळक एक-दोन मुद्यांवर ४-५ मिनिटांचे छोटेसे भाषण करून रजा घेण्यातच स्वारस्य असते. हा माणूस थोडक्यात पण चटकदार बोलतो, एक-दोन मुद्यांनाच बिनचूक हात घालतो, अशी लोकांची खात्री पटविण्यातच त्याच्या लोकप्रियतेचा पाया घातला. जातो. गुद्यासारखा मुद्दाही असा ठळक नि जोरकस असावा की लोकांनी त्यावरच डोके खाजवीत घरोघर जावे नि सगळीकडे त्याचीच चर्चा सारखी होत रहावी.
लोकांना खवळवा, पण तुम्ही स्थिरचित्त असा
लोकांना खवळून सोडायचे असेल, संतप्त करायचे असेल, तरी स्वतः वक्त्याने आपल्या मनोविकारांना दाबात ठेवून, शांतपणानेच बोलत रहावे. लोकांच्या मनोविकारांना भडकविण्याची कामगिरी गोळीबाराच्या वेळी बंदुकांच्या फैरी झडतात त्याप्रमाणे आपल्या मुद्देसूद शब्दयोजनेच्या ठोसदार नि पल्लेदार फेकांवरच सोपवावी. वक्ता पाहावा तर शांत वृत्तीने, आवाजाचा ताण किंवा कढ किंचितही न वाढवता बोलतो आहे, आणि तिकडे लोक मात्र विलक्षण भावनांनी खवळले आहेत, असा देखावा जो निर्माण करील त्यानेच त्या सभेत मैदान मारून फड जिंकला असे समजावे. लोकहिताची सहृदयी तळमळ ज्याला असते, असेच वक्ते हा चमत्कार घडवू शकतात. येरा चऱ्हाट्यांचे ते काम नोहे. कित्येक वेळा एखादी हृदयद्रावक घटना तो भरल्या कंठाने, काकुळतीच्या खर्ज स्वरांनी सांगत आहे आणि क्षणोक्षणी उसळत्या संतप्त भावनांनी लोक त्या विवेचनाला `शेम शेम`च्या आरोळ्यांनी दाद देत आहेत, असला देखावाही वक्त्याच्या वाग्चातुर्याचे सार्थक करतो. सारांश, सभाजन खवळले असता त्यांना शांत करणे आणि शांत असता त्यांना प्रक्षुब्ध करणे, ही वाग्चातुर्याबरोबरच हृदयाच्या तळमळीची करामत असते. मनोविकारांच्या भरती-ओहोटीप्रमाणे स्वरांच्या यथातथ्य आरोह-अवरोहांचे महत्त्व याच ठिकाणी वापरायचे असते नि अनुभवायचेही. असते.
थोड्यात गोडी
भाषणाची लांबी-रुंदी किती असावी, याचाही विवेक पाहिला पाहिजे. लोकमानसाचा अंदाज घेता त्यांना लांबलचक भाषणांची चऱ्हाटे मुळीच आवडत नाहीत. परिषदा नि संमेलनांच्या अध्यक्षांची लांबलचक छापील भाषणे एकदा का ते वाचू लागले की सभाजन त्या चोपड्याच्या प्रती खाकोटीला मारून चहा पिण्यासाठी बाहेर सटकतात. हा देखावा नेहमी पाहण्यात येतो. भाषण छापलेले आहे, मोठे विद्वत्तापूर्ण आहे, फार परिश्रमाने लिहिलेले आहे, वाचता येईल निवांतीने ते घरी गेल्यावर. हाच ज्याचा त्याचा विचार असतो.
स्वागताध्यक्षांच्या भाषणांची हीच तऱ्हा. ते थोडक्यात समर्पक नि चटकदार असेल तर त्यातील स्वागताची गोडी चाखता तरी येते. पण कित्येक स्वागताध्यक्ष जेव्हा आपल्या गावाचा इतिहास, तेथली देवळे, नद्या, ओढे, हवापाणी आणि हयात मयत स्थानिक नेत्यांच्या माहितीचे पुराण वाचू लागतात तेव्हा, श्रोत्यांत साहजिकच चुळबुळ चालू होते. व्याख्यान म्हणजे मुबलक शब्दांची वारेमाप चर्पटपंजरी नव्हे. त्याचप्रमाणे मी दीड तास बोललो या गर्वोक्तीतही मोठी धार मारली असे होत नाही. लोकांना एखादा विशेष विचार कळकळीने, पण ठासून सांगायचा असला तर तो माफक शब्दांनी नेमस्त वेळातही सांगता येतो.
व्याख्यानाचे तीन टप्पे
व्यासपीठावर वक्त्याने पाऊल टाकताच, प्रथम त्याने समोर बसलेल्या किंवा असलेल्या श्रोत्यांवर आपली नजर चौफेर टाकावी. या नजरफेकीतच श्रोता नि वक्ता यांचा परस्पर परिचय होत असतो. केवढ्या छोट्या अथवा मोठ्या लोकसमुदायाकडे आपल्याला आपले विचार मांडायचे आहेत आणि तो समुदाय ह्या क्षणाला कोणत्या मनःस्थितीत आहे, याचा वक्त्याला अंदाज घेता येतो.
सामान्यपणे व्याख्यानाचे (१) प्रस्तावना, (२) विवेचन आणि (३) समारोप असे तीन टप्पे असतात. त्यातल्या त्यात प्रस्तावनेच्या पहिल्या एक-दोन वाक्यातच वक्त्याच्या कुवतीची आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाची (पर्सनॅलिटीची) श्रोत्यांना ओळख होते. त्याच्या हेतूचा, कळकळीचा नि आत्मविश्वासाचा साक्षात्कार लोकांना याच क्षणाला होतो. प्रस्तावनेच्या पहिल्याच उद्गारात श्रोत्यांचे लक्ष आपल्याकडे आकर्षून घेण्याची हिकमत वक्त्याला येथेच साधायची असते.
`मित्र हो, सभ्य गृहस्थ हो` इत्यादी, `हो-कारी संबोधने वापरा वा नका वापरू. त्यांचे महत्त्व फारसे नसते. ती आता एक निरर्थक रूढी झालेली आहे. पण उभ्या जगाला अपूर्व धक्का देणारे जे एक संबोधन प्रथमच उच्चारले गेले, त्याचा महिमा काही न्याराच! अमेरिकेत शिकागो येथे सर्वधर्मपरिषदेच्या व्यासपीठावर येताच, स्वामी विवेकानंदांनी सभाजनांना उद्देशून `ब्रदर्स अॅण्ड सिस्टर्स` एवढा उद्गार काढताच, सभागृहात पाच मिनिटांपर्यंत आनंदाच्या नि उत्साहाच्या टाळ्यांचा सारखा गजर होत राहिला. त्या क्षणापर्यंत जगातल्या कोणत्याही व्यासपीठावर कोणत्याही वक्त्याने केव्हाही न उच्चारलेल्या त्या संबोधनाने स्वामीजीनी त्याच क्षणाला सभा जिंकून फड गाजविला. त्यातले मर्म नि माहात्म्य आजकालच्या `भगिनी बांधवहो`मध्ये दिसणार नाही. त्या वेळेपर्यंत पाश्चिमात्य व्यासपीठांवर `लेडीज अॅण्ड जण्टलमेन` ह्याच रुढीबद्ध संबोधनाचा वापर सर्रास चालू होता. पण विवेकानंद उभे राहिले होते भिन्न भिन्न धर्मपंथांच्या प्रवर्तकांपुढे. त्यांची सहानुभूति संपादून वैदिक धर्माच्या विश्वात्मैक्य भावाचे रहस्य त्यांच्या गळी उतरविण्यासाठी. `ब्रदर्स अॅण्ड सिस्टर्स` या पहिल्याच उद्गाराने साऱ्या सभाजनांना त्यांनी पटवून दिले की "मी आज माझ्या भावाबहिणीपुढेच उभा आहे." या संबोधनाचे त्या अपूर्ण क्षणाचे तेज, तेच पहिले नि शेवटचे. आता तो एक प्रघात झाला.
वजनदार प्रस्तावना कशी करावी?
संबोधनाच्या नादी न लागता, वक्त्याने एखादे महत्त्वाचे तत्त्व, सिद्धांत किंवा सुभाषिताची एखादी ओळ ठासून सांगताच, श्रोत्यांचे लक्ष चटकन आपल्याकडे खेचून घेता येते. (१) ज्याचे हत्यार चोख त्याचे स्वराज्य, (२) मेरी झांसी नही दूंगी, (३) बचेंगे तो और भी लढेंगे, (४) हे राज्य व्हावे हे श्रींच्या मनात फार आहे. ऐतिहासिक महत्त्वाचे असे एखादे सूत्र किंवा उक्ती पहिल्या धडाक्यालाच उच्चारताच श्रोत्यांची उत्सुकता तात्काळ वाढते आणि आज आपल्याला इतिहासातली काहीतरी रोमांचकारी हकीकत ऐकायला मिळणार, अशी उत्सुकता तयार होते. पुष्कळदा एखादी म्हणसुद्धा श्रोत्यांना वक्त्याच्या विचारांची दिशा दाखवते. सभा जिंकून मैदान मारायला अनेक म्हणी, सुभाषिते फार उपयोगी पडतात. मात्र सभेपुढे असलेल्या विषयाला धरूनच त्यांची योजना केली पाहिजे.
आणखी एक मार्ग. व्याख्यानाची सुरुवात एखाद्या गोष्टीने करावी. विद्वानांच्या विद्वत्तापूर्ण नि गंभीर प्रस्तावनेपेक्षा, साध्यासुध्या गोष्टीकडे लोकांचे लक्ष चटकन वेधले जाते. `एक होता राजा` एवढे शब्द ऐकताच लोकांचे कान टवकारले जातात. त्या राजाच्या गोष्टीचा संदर्भ सभास्थानी चाललेल्या विषयाला तंतोतंत नेऊन भिडविताच, वक्त्याविषयी लोकांचा कौतुकादर आपोआप वाढीला लागतो. त्यांना आपल्या बाजूला घेऊन प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यातच वाग्चातुर्याची खरी कसोटी असते.
हा घ्या अनुभवांचा दाखला
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा तो काळ. जिल्हानिहाय निवडणुका संपल्या होत्या. बृहन्मुंबईच्या लवकरच होणार होत्या. ठिकठिकाणी महाराष्ट्रवादी उमेदवार हमखास निवडून येणारच येणार, असा लोकांचा आत्मविश्वास फुरफुरला होता. इतक्यात कऱ्हाडला काँग्रेस विषयी झाल्याची बातमी आली. सत्याग्रहाचा, त्यागाचा नि बलिदानाचा एवढा प्रचंड हिमालय उभा केला, तरीही काँग्रेस त्यावर मात करणार? जनतेचा नूर खाडकन् उतरला! शिवाजी पार्कवर विराट सभा थाटली. लोकांतला उत्साह मावळलेला. व्यासपीठावर एकही वक्ता दिसेना. कोणाचीही वाट न पाहता मी सरसावलो. ध्वनिक्षेपक समोर आणताच बेछूट पहिली गर्जना केली -
वसईच्या किल्ल्यात आज माझे मुंडके पडल्याशिवाय ही मोहीम संपणार नाही. वसई सर होत नाही म्हणजे काय थट्टा आहे?
लोकांना या गर्जनेचा संदर्भ समजला आणि त्यांनी उत्साहाने टाळ्यांचा कडकडाट केला. डोळ्यांपुढे पराभव स्पष्ट दिसत असताही चिमाजी आप्पांच्या त्या उद्गाराने मऱ्हाठी जवानांनी चढाईचा कसा जबरदस्त एल्गार केला नि वसई जिकली, तो इतिहास थोडक्यात सांगून, लगेच दुसरी गर्जना केली
भूमीवर हकनाहक सांडलेले निष्पाप जनतेचे रक्त सम्राटांची सिंहासने जाळून पोळून खाक केल्याशिवाय रहात नाही.
या सिद्धांताचा धागा विराट पर्वातील कथेला नेऊन भिडवला. विराज राजाने कंकभटाच्या (युद्धिष्ठिराच्या) टाळक्यात सोंगट्याचा इस्तिदंती फासा तडकावून मारला. भळभळा रक्ताची धार लागली. ते पाहताच सैरन्धी चटकन धावली नि तिने ते रक्त ताम्हणात धरले. एका बटकीने ही लुडबुड का करावी, म्हणून राजाला राग आला. ती म्हणाली "राजा, निष्पाप निर्वैर माणसाचे रक्त या भूमीवर पडेल, तर क्षणार्धात तुझ्या राज्याचा नायनाट होईल, म्हणून धरले हे रक्त या ताम्हणात.`` या कथनाचा संदर्भ मुंबईत धारातीर्थी पडलेल्या १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाशी जोडून मी म्हणालो "माय बापहो, त्या १०५ हुतात्म्यांपैकी ७५-८० हुतात्म्ये विवाहित होते.
तरुण होते. नव्या संसाराचा श्रीगणेशा काढीत होते. बैलजोडी छाप असलेल्या मतपेट्यांत त्या आपल्या विधवा लेकी, सुना, बहिणीच्या कुंकवाचा सडा पडलेला आहे. त्यांच्या फुटलेल्या बांगड्यांचा खैकोळ त्यात सावडलेला आहे. त्यांच्या मंगळसूत्रांची भेंडोळी त्या पेट्यात ठासून भरली आहेत. अशा त्या मतपेट्यात तुम्ही आपली मते टाकणार आहात काय?" असा विव्हळ स्वरात पण ठासून सवाल टाकताच एकदम सगळा महिला वर्ग तडाड चवताळून उठला आणि "नाही नाही प्राण गेला तरी नाही" अशा आरोळ्या देऊ लागला. सारी सभाच या आरोळ्यांनी दणाणून गेली.
बस्स. लोकांवर एवढा परिणाम होताच, भाषण संपवून मी खाली बसलो. अवघ्या पंधरा मिनिटांचा कारभार मैदान असे मारावे लागते. यासाठी लांबलचक भाषणाची जरुरच काय?
व्याख्यानाचा मध्यभाग-निरुपण
चटकदार प्रस्तावना करून श्रोत्यांचे लक्ष आपणाकडे वेधून घेतल्यावर, वक्ता मुख्य विषयाच्या विवेचनाकडे वळतो. ते विवेचनही थोडक्यात नि मुद्देसूद असावे. त्यात पाल्हाळ नसावा. अमूक अमूक मुद्द्यांवरच आपल्याला बोलायचे आहे, त्याची रूपरेषा स्पष्ट आखलेली असली म्हणजे वारेमाप बडबडीच्या वावटळात गुरफटण्याचा प्रसंग ओढवत नाही. नदीचा उगम लहानशा झऱ्यात असतो. पुढे वाढत वाढत फोफावत गेला म्हणजे त्याचे खळखळणाऱ्या विशाल नदीत रूपांतर होते. भाषणशैलीचा असला `उत्कर्ष` असा साधावा लागतो. सुरुवातीला श्रोत्यांवर पाडलेली छाप आणि तिची `पकड` अखेरपर्यंत टिक्वावी लागते. चढत्या वाढत्या पायरीने, आपल्या विचार विकार नि भावनेच्या प्रवाहाबरोबर श्रोत्यांना अलगद वाहवत नेले पाहिजे. विवेचनाच्या आणि विधान- कौशल्याच्या भर रंगात वक्ता रंगला का श्रोतेही त्याच्या बरोबर त्या अत्युच्च पातळीवर तादात्म्याने रंगतात. इतके तद्रूप तल्लीन होतात की हा माझेच विचार बोलत आहे, असा त्यांना साक्षात्कार होतो.
पण असे `आपणासारखे करिती तात्काळ` आवाक्याचे पट्टीचे वक्ते फार थोडे. लोकशाहीत वक्तृत्वाला केवढाही उत्तेजक वाव असला, तरी त्यात प्रचारी म्हणजेच बाजारी भाषकांचा भरणा फार. तेथे वक्तृत्वाचे शास्त्र नसते आणि कलाही आढळत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या वक्त्यांत हृदयाची जी तळमळ, हिताहिताचे मुद्दे लोकांच्या मनावर ठसविण्याचा जो जिव्हाळा, पारतंत्र्याची चीड निर्माण करण्याचा जो अट्टाहास आणि तत्त्व प्रतिपादनाचा जो प्रामाणिकपणा चमकला, तसा तो आजकालच्या प्रचारी नि पक्षीय भाषणात आढळतच नाही. खरे पाहिले तर पुष्कळशा भाषकांना फारसे काही सांगायचेच नसते. ते कसलीही तयारी करून सभेला येत नाहीत.
आपण चार शब्द बोला` असा आग्रह होतो म्हणून ते बोलायला उठतात. अशा मोले बोलाया घातलेल्या बोलभांडाकडून शब्दांच्या फापटपसाऱ्याशिवाय निराळे काय आढळणार? एकदा का असा वक्ता "मला असं सांगायचं आहे", "मी अस सांगू इच्छितो", "लक्षात घेण्यासाखा मुद्दा हाच की" असल्या पादपूरणी वायफळ वाक्यांची भरमसाट पेरणी करू लागला म्हणजे खुशाल समजावे की त्याच्यापाशी सांगण्यासारखे आणि लोकांनी शांतपणे ऐकण्यासारखे काही नाही. कित्येकांना दरएक वाक्यानंतर `आऽऽणि... आऽऽणि` हे उभयान्वयी अव्यय वापरल्याशिवाय पुढचा विचार अथवा मुद्दाच सुचत नाही, तेही याच मासल्याचे.
समारोप- समाप्ती
व्याख्यानाच्या भर रंगाचा झोत शिखराकडे गेला असताना किवा जात असतानाच खटकन भाषणाची समाप्ति करण्यातच खरी मौज असते. येथे श्रोत्यांना जो गोड चक्का मिळतो, त्यामुळे त्या वेळच्या मुद्द्यांवर अथवा वक्त्याच्या सिद्धांतावर विचार करीतच ते घरोघर जातात आणि त्याचीच चर्चा सगळीकडे चालू होते. डॉ. अॅनी बेझण्टबाईचा हाच क्रम असे. व्याख्यान अत्युच्च बिंदूवर गेले का झपकन भाषण थांबवून त्या व्यासपीठावरून निघून जात. नामदार गोपाळ कृष्ण गोखले अशाच ठिकाणी भाषण संपवून खाली बसले का श्रोत्यांना "अरेरे, आणखी काही त्यांनी बोलायचे होते हो" असे चुटपुटत असत. लोकमान्य टिळकही समारोपाच्या फारसे भानगडीत पडत नसत. "मनात जे विचार नेहमी खळवळत असतात, तेवढेच आजवर मी तुम्हाला सांगत आलो. त्याचा विचार करणे वा न करणे हे आता तुमचे काम." असेच काही बोलून ते आपल्या भाषणाची समाप्ती करीत असत.