ऊठ मऱ्हाठ्या ऊठ
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
महाराष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी
ऊठ मऱ्हाठ्या ऊठ
लेखक : प्रबोधनकार के. सी. ठाकरे
प्रकाशक :
गजाजन गोविंद आठवले
आराधना प्रकाशन
१, झपूर्झा, साहित्य सहवास,
वांद्रा पूर्व, मुंबई ४०००५१
प्रबोधनकार के. सी. ठाकरे
`मातोश्री’ बंगला, कलानगर,
वांद्रा पूर्व, मुंबई, ४०००५१
मुद्रक :
चिंतामण वामन जोशी
माधव प्रिंटिमग प्रेस,
अलिबाग, कुलाबा
मूल्य : २ रुपये ५० पैसे
प्रकाशन : १९ सप्टेंबर १९७३
प्रस्तावना
प्रबोधनकार ठाकरे याच्या पुस्तकाला मी चार शब्द लिहावेत ही कल्पनाच मोठा विलक्षण आहे. दादा हे आम्हा पत्रकारांचे आजोबाच म्हणायचे. त्यांनी त्यांच्या तिखट लेखणीने आणि कृतिशूरतेने महाराष्ट्र गाजवला आणि जागवला. अन्याय-अंधश्रद्धा आणि दुष्ट रूढी यांच्यावर फक्त लेखणीचे वार करून दादांनी समाधान मानले नाही. कंबर कसून ते या लढ्यात प्रत्यक्ष सहभागीही झाले.
संयुक्त महाराष्ट्र लढ्यातले त्यांचे कर्तृत्व प्रत्यक्षात बघायचे भाग्य मला लाभले. महाराष्ट्राचे नेते नामोहरम होऊन या लढ्यातून पळ काढू लागले तेव्हा शेलारमामांच्या आवेशाने दादा या लढ्यात उतरले. अस्सल मऱ्हाठी बाणा असलेला हा चिवट-झुंजार म्हातारा बघून आम्हा तरुणांनादेखील आमच्या तारुण्याची लाज वाटली. आमचा उत्साह, संताप, त्वेष आणि तडफड दादांच्या पासंगालाही पुरणारी नव्हती आणि मग आम्ही अधिक चेवाने संयुक्त महाराष्ट लढ्यात उभे झालो.
मुंबईत येणाऱ्या परप्रांतियांच्या लोंढ्याविरुद्ध दादांनी आवाज उठवला. सारे पत्रकार याविषयी मूग गिळून बसलेले बघून दादांनी या प्रश्नावर लेखणी परजली. मराठी माणसाचा स्वाभिमान जागवत. त्याला ऐक्याची हाळी घालत त्यांनी मुंबईत शिवसेना उभी करण्यास योग्य असे वातावरण निर्माण केले. शिवसेनेला तत्त्वज्ञानाचा भरभक्कम पाया घालण्याचे कामच दादांनी केले. ह्या पुस्तकातले लेख शिवसैनिकांनीच नव्हे प्रत्येक मराठी माणसाने आत्मसात करावेत.
मराठी माणसाला त्याच्या लढाऊ परंपरेची याद दून, त्याच्यावर जमलेली भोंगळ सहिष्णुतेची जळमटे झटकणारे हे लेख मलाही मार्गदर्शक ठरले आहेत, अधिक काय सांगणार?
नाना वांद्रेकर
हे लेख साप्ताहिक `मार्मिक’मध्ये १४ ऑगस्ट १९६६ ते ३० ऑक्टोबर १९६६ या काळात क्रमशः प्रसिद्ध झाले आहेत.
लेख १
स्वाभिमानाची लागवड
स्वाभिमान! स्व + अभिमान – स्वतःविषयी अभिमान, मानवी जीवनातील सर्व आशा आकांक्षांच्या उत्कर्षाचा हा पाया. व्यक्तिंच्या काय किंवा देशाच्या काय, सर्वांगीण त्थानाचा पाया स्वाभिमानच. स्वाभिमानशून्य व्यक्तीला आणि समाजाला जगाच्या व्यवहारात मातीच्या मोलानेही कोणी विचारीत नाही. स्वाभिमानाचे क्षेत्र स्व-पुरतेच संकुचित नाही व नसते. त्याचा विस्तार स्वतःचे कुटुंब, घराणे, जन्मग्राम, जन्मस्थळ, स्वजाती, गावकरी, भगिनी, बांधव, गावातील पवित्र स्थाने, संस्था असा फोफावत जात जात स्व-राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र येथपर्यंत होत असतो. स्वाभिमानाच्या अस्सल जिव्हाळ्याने येथवर मजल मारल्यानंतरच भारत राष्ट्राविषयीचा जिव्हाळा (परिस्थिती तितकीच देवाण घेवाणीची असेल तर) निर्माण होणे शक्य आहे.
वेळी अभिमानाच्या कक्षेत जन्मग्राम टिकले तरी जन्मस्थळाचा पत्ता सांगणे आजकाल कठीण झालेले आहे. महाराष्ट्राच्या बहुतेक उदयोन्मुख पिढ्यांचे जन्म इस्पितळात होत असतात. `माझा जन्म अमुक तमक इस्पितळात झाला,’ असे अभिमानाने सांगणारा आसामी सहसा आढळत नाही. अभिमानाचा एक झरा येथे खुंटतो.
जात्याभिमानाबद्दल मात्र विशेष खुलासा केला पाहिजे. भारतात तथाकथित लोकशाहीचा बाजार चालू झाल्यापासून, `जातीयता एक मोठे पाप’ ठरण्यात आले आहे. नवलाची गोष्ट इतकीच की जातीयतेच्या तिटका-याच्या तमाशांचे फड नाचविणारांनी जातीयता म्हणजे काय? तिची काटेकोर व्याख्या काय? याचा कदाही चिकित्सेला पटेल असा स्पष्ट खुलासा
आजवर केलेला नाही. भाषणबाजीत टाळ्या मिळण्यासाठी जातीयतेवर तुटून पडणा-यांनाही स्वजातीचा जिव्हाळा सोडवत नाही. व्यक्तीच कशाला? आपल्या महाराष्ट् राज्यात मंत्र्यांच्या निवडणुकासुद्धा जातीय तत्त्वावरच होत आल्या नि होत असतात. तेथे मंत्र्याच्या लायकी नालायकीचा विचार फारसा होत नाही. मंत्र्यांच्या निवडणुकीचा प्रश्न चर्चेच्या चुल्हाणावर चरचरत असताना, प्रत्येक जात जमात `आमचाही एक मंत्री घेतला पाहिजे’ अशा आग्रहाच्या आरोळ्या मारताना काय कोणी ऐकले वाचले नाही? प्रत्यक्ष राज्यकारभाराच्या क्षेत्रात जर जातीच्या महात्म्याची सत्यनारायणाची पूजा (निर्लज्जपणे) बांधली जाते, तर एखाद्या व्यक्तीने स्वाभिमानाच्या विकासासाठी स्वजातीविषयी जिव्हाळा व्यक्त केला, जात्युन्नतीच्या कार्यात भाग घेतला, तर मात्र भारताच्या जातिधर्मांतील सेक्युलरिझमचे डोळे का पांढरे होतात? बरे, उठल्यासुटल्या या जातिधर्मातील `झम्’ची चाललेली बडबड हे तरी काय गौडबंगाल आहे? भारताच्या घटनेत सेक्युलरिझम हा शब्द शोधूनही सापडायचा नाही, हे नागडे सत्य गोरेगावच्या मसुराश्रमाचे दिवंगत ब्रह्मचारी दत्तमूर्ती यांनी प्रथम चव्हाट्यावर उघडे केले. तोवर लोकसभेत मिरवणा-या काही हिंदू खासदाराच्या लक्षात ढोबळ कांग्रेजी माया चुकून एकदाही आली नाही. खुशाल सगळे घटनेचा उल्लेख `सेक्युलर कॉन्स्टिट्यूशन’ म्हणून करीत बसले आहेत. पण ता अलिकडेच मी. एम. आर. मसानी आणि प्रो. रत्नस्वामी (घटना रचनेत या महाशयांचाही हात होता.) अखिल भारतीय ख्रिश्चन कॉन्फरन्समध्ये बोलताना ते म्हणाले की, `भारत हे जातीधर्मातीत सेक्युलर राष्ट्र नव्हे आणि भारताची घटना ही तर सेक्युलरीझमच्या अगदी विरुद्ध आहे.’
सारांश, हा जातीधर्मातीतपणाचा बागुलबुवा मतलबी काँग्रेसाग्रणींनी भोल्याभाबड्या जनतेला हकनाहक बनवण्यासाठी मुद्दाम हवेवर सोडलेला फसवा फुगोरा आहे.
हिंदू मुसलमानातील दंग्यांना `जातीय दंगे’ संबोधण्याची एक फॅशन पडली आहे. जातीय शब्दाचा इंग्रजी प्रतिशब्द कम्युनल आणि जमात या शब्दालाही तोच प्रतिशब्द. येथे कास्ट आणि कम्युनिटी या दोन शब्दांचा अकरमाश्या संबंध जोडून, वरचेवर लोकांच्या मनात गोंधळ उडविण्याचा खटाटोप नेहमी चालू असतो. इतकेच नव्हे तर नवपरिमत (जुन्या थाटाघाटाची) वधू जसे आपल्या नव-याचे नाव घ्यायला लाजत असे, त्याच लाज-या बुज-या थाटात हिंदू मुसलमान दंग्यांच्या बातम्या देताना, अमुकतमुक ठिकाणी दोन जमातीत दंगा झाला असा मोघम उल्लेख करण्यात येत असतो. मुसलमानाचे नाव घ्यायला सरकार आणि त्यांच्य वृत्तसंस्था एवढ्या का बिचकतात नि घाबरतात हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. मागे वंगभंगाच्या धुमाळीत पूर्व बंगालचे लेफ्टनण्ट गव्हर्नर सर बम्फील्ड फुल्लर मुसलमान जमातीचा उल्लेख `प्यारी रण्डी’ म्हणून करीत असत. तोच मस्केबाज नखरा सध्याच्या काँग्रेजी सरकारनी, मुसलमान जमातीचे नाव न घेता, मागील अंकावरून पुढे चालू ठेवला आहे की काय कळत नाही.
गांधी युगात `हिंदू-मुस्लिम भाई भाई’चा मीनाबाजार मुबलक बोकाळला होता. हिंदू दे. भ. नी मशिदीत जाऊन भाषणबाजी केली. आणि हिंदू देवळांच्या प्रांगणात मुसलमान दे. भ. नी फर्मास व्याख्यानबाजी झोडली. या भाई-भाई थोतांडाला अहिंसावादाचे सोनेरी गिलीट चढविण्यासाठी म. गांधींनी शौकतअल्ली महंमद अल्लीला गोप्रदान केले. अहाहा, काय हो तो सोहळा! लोकांचे काय? ते नेहमी बनानेवाल्यांच्या मागे मेंढरासारखे धावणारे. त्यांनी हिंदू-मुस्लिम भाईभाईच्या नरडेफाट गर्जना केल्या आणि मनगटांची हाडे ढिली होईतोवर टाळ्या पिटल्या. असे करताना आपल्या स्वाभिमानाची मुंडी कोणीतरी करकचून पिळीत आहे, यांचे कोणालाच भान राहिले नव्हते. धर्मातीतपणाचा एवढा गगनभेदी बेण्डबाजा वाजला पण अखेर काय? गांधी नेहरूंच्या छाताडावर टाच देऊन जिनाने पाकिस्तान हिसकावून घेतलेच ना? तथाकथित राष्ट्रनेत्यांच्या स्वाभिमानाचा पाठकणा किती आरपार पिचलेला आहे, याचा बिनचूक आडाखा बांधूनच जिनाने भारताची खाटकी काटछाट केली.
जात काय नि धर्म काय, यांचे अभिमान माणसाच्या जन्माबरोबरच जन्माला येत असतात. `आम्ही जातपात धर्म मानीत नाही,’ असे बरळणारे शिखण्डी हिंदुंतच फार सापडतात. आई, बाप, बायको मेल्यावर, पांढरी कॉलरवाले हे पांढरपेशे दाढीमिशा डोके भादरून, नासिकच्या रामकुंडावर मयतांची राख-हाडे मोक्षाला पोचविण्यासाठी मुकाटतोंडी जाताना कोणी पाहिलेच नाहीत? वाणी करणीचा व्यभिचार करणा-या करंट्यांना इतर जबरदस्तांची पायतणे चाटूनच जगण्याचा बांका वखत आला, तर त्यांची काय म्हणून कोणी कीव करावी? मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, बोहरी इत्यादी हिंद्वेतर जातीत असला कोडगेपणा आढळणार नाही. स्वाभिमानशून्यानाच आपली जात नि धर्म ठणकावून सांगण्याची हिंमत होत नाही.
छत्रपती शिवरायांच्या लोकसंग्रहाचे एक गमक आज विचारात घेण्यासारखे आहे. राष्ट्राच्या उत्थानासाठी लोकसंग्रहाच्या क्षेत्रात जाती धर्माच्या भावना वापरू नयेत, म्हणून राष्ट्रकार्यासाठी बाहेर पडताना त्या भावना प्रत्येकाने आपल्या घराच्या उंबरठ्याच्या आत ठेवून बाहेर पडावे अशी छत्रपतींची सक्त ताकीद असे. पण सबंध महाराष्ट्र जातीधर्मातीत सेक्युलर आहे, असा फतवा त्यांनी काढला नाही किंवा आपण स्वतः तसे आहोत, अशा वल्गनाही केल्या नाहीत. जाती आणि धर्म व्यापणा-या स्वाभिमानाच्या कक्षा किंचितही न दुखावता, छत्रपतींच्या सैन्यात मराठे नि मुसलमान एकजूट एकमूठ महाराष्टाराच्या उत्थानासाठी लढत होतेच ना? पण अल्पायासाने नि जवळ जवळ अचानक हातात आलेल्या राज्यसत्तेच्या घोड्यावरील ऊर्फ टोळकीय मांड कायम टिकविण्यासाठी जी अनेक कारस्थानी सोंगेढोगे धूर्त मतलब्यांना करावी लागतात, ती जनतेच्या पचनी बिनबोभाट पडावी, एवढ्याचसाठी जातीधर्मातीतपणाचा खुळखुळा काँग्रेजियाना वाजवावा लागतो. जात वर्ज्य, धर्म वर्ज्य, मग म. गांधी, जवाहरलाल नेहरू, शास्त्री यांच्या मृत्यूंनंतर त्यांच्या और्ध्वदेहिक संस्कारांसाठी सरणाभोवती भटाब्राह्मणांची गर्दी कशाला आणि ते मंत्रघोष तरी का? काही वर्षापूर्वी नासिक जिल्ह्यातील मालेगावी एका कॉलेजचे, तत्कालीन राष्ट्राध्यक्ष राजेंद्रप्रसादांच्या हस्ते उद्घाटन झाले. रेडिओवर तो कार्यक्रम संपूर्ण ध्वनिप्रसारित केला होता तेव्हा अनेक वेदाभ्यासी ब्राह्मणांकडून वैदिक ऋचांनी समारंभाची नांदी उरकण्यात आली. समजा, राजेंद्रबाबूंच्या ऐवजी जर उपराष्ट्रपती झाकीर हुसेन साहेब उद्घाटनाला आले असते, तर काय तेथील कार्यकर्त्यांनी मंगलचरणासाठी कुराणातील कलमा पढायला मुल्ला मौलवींना पाचारण केले असते? त्यांनी तरी वैदिक ऋचांचे श्रवण आणि मंत्रोच्चारांनी होणारा विधी पाटावर आसनमांडी घालून `म्हणा मम आत्मना श्रुति स्मृति पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम्’ म्हटले असते काय? आणि समजा, त्यांनी म्हटले असते तर अनेक राजकारणी ढोंगापैकी ते एक ढोंगच ठरले असते. मुसलमानामचा ईस्लाम धर्माभिमान केवढा कडवा असतो, याचे दाखले आज गेली १३०० वर्ष सारी दुनिया पाहात, अनुभवीत आहे. कडू कारल्याप्रमाणे त्यांना `भाई भाई’च्या तुपात तळा नाही तर गोप्रदानाच्या साखरेत घोळा, ते आपली जातीयता नि धर्मियता पिढीजात गुण म्हणा, अवगुण म्हणा – सोडणारच नाहीत.
आजची महाराष्ट्राची अवस्था थेट शिवपूर्व कालासारखीच हल्लाकीची नि बजबजपुरीची आहे. स्व-राज्य (?) आले म्हणतात, तरी सु-राज्याची अस्पष्ट झुळुकही आम्हाला चाटताना अनुभवाला आलेली नाही.शिवपूर्व कालाप्रमाणेत आजही आम्ही दिल्लीच्या सुस्का-यावर जगत मरत आहो. महाराष्ट्र राज्य स्थापन झाले, ते सुद्धा म-हाठ्यांच्या रक्तपातावर आणि बलिदानावरच! इतके सारे होऊनही या राज्याच्या कारभार-यांना कारभाराचे एकएक पाऊल उचलताना दिल्लीवाल्या काँग्रेजी मठपतींच्या लहरीचा आगाऊ सुगावा घ्यावा लागत असतो. सर्व सत्ताधारी काँग्रेजी हुकूमशहांच्या जाती-धर्मातीतपणाच्या आणि `सर्व भारतीय एक’ या अनैसर्गिक थोतांडामुळे महाराष्ट्र राज्य म-हाठ्यांचे असताही आज येथे म-हाठ्यांना सूळ नि उप-यांना गूळ चारण्यात येत असतो. महाराष्ट्र राज्यभर परप्रांतीय उप-यांचा मनस्वी सुळसुळाट झाला, रोज वाढत्या श्रेणीने होतच असतो, तरीही काँग्रेजी सत्ताधा-यांच्या धास्तीने आमच्या म-हाठी राज्य-कारभा-यांना तो लोंढा रोखण्याची छातीच होत नाही. अन्न आसरा नि वस्त्रांच्या पुरवठ्याचा प्रश्नही दिल्लीकरांच्या मेहरनजरेवर सदोदित लोंबकळतो. सारांश आज आम्ही म-हाठे, आमच्याच महाराष्ट्र राज्यात स्वतःच्या घरात उप-याच्या जिण्याने जगत आहोत.
शिवपूर्वकाली ठिकठिकाणी किती तरी बहाद्दर पंचहाजारी नि दसहजारी मराठे सरदार होते. आपली पराधीनता, हल्लाकी आणि डोळ्यांसमोर होणारी स्वधर्माची बेसुमार अवहेलना हे सरदार आज ना उद्या दूर करतील, अशा भाबड्या आशेवर म-हाठी जनता दिवसावर दिवस कंठीत होती. ज घडीला त्या सरदारांची भूमिका भारतात उफाळलेल्या राजकारणी पक्ष पार्ट्यांनी घेतली हे. भारताचा सर्वांगीण उद्धार करणारे महाभाग काय ते आम्ही नि आमचा पक्ष असल्या नगारे चौघड्यांचा त्याचा दणदणाट गेली कित्येक वर्षं अखंड चालत आला आहे. बुडत्याला काडीचा आधार न्यायाने हे पक्ष तरी आपला उद्धार करोत, या आशेने हजारो लोक या ना त्या पक्षाच्या पिंज-यात पोपटासारखे अडकून पडले आहेत. शिवपूर्वकालीन मराठे सरदारांप्रमाणे या पक्षाच्या निष्ठा तरी कुठे एकजनिशी आहेत? काही मराठे सरदार विजापुरच्या आदिलशाहीच्या कच्छपी, काही अहमदनगरच्या निजामशाहीच्या, काही गोवळकोंड्याच्या, काही इमादशाही, बरीदशाहीच्या अशा त्यांच्या निष्ठा `पट्टीस पावली’ देईल त्याच्या भजनी लागलेल्या. बरे, तेथे तरी काही एकनिष्ठता? छे, नाव कशाला? जिकडे घुग-या तिकडे उदो उदो करायला ते सारे एक सोडून दोन पायावर तयार. निजामशाहीचा सरदार उद्या पहावा तर आदिलशाहीला चिकटलेला. तेथे जुगले भागले नाही तर लगेच दक्षिणेवर चाल करून आलेल्या अथवा येणा-या मोंगल पातशहापुढे साष्टांग दंडवत घालायला तयार. सगळ्यांचीच निष्ठा वारांगनेसारखी. छिचोर नी आपमतलबी. बिचा-या सैनिकांचे काय? भरला दरा तो सरदार बरा ही त्याची अवस्था. आपण कशासाठी हातावर शिरे घेऊन लढत होत, कोणासाठी पोट बांधून रक्ताच्या रंगपंचम्या खेळत आहोत, याचा विचारही कोणाला चुटपुटता चाटून जात नसे. कारण त्याच्या स्वाभिमानाचेच तळपट उडालेले होते.
स्वाभिमान चांगला रसरशीत टरारलेला असला तरच त्याची भिंगरी स्व-पासून स्व-देशापर्यंत बिनधोक रोंरावत जाते. अभिमान शिकावा अगर शिकवावा लागत नाही. प्रत्येकाच्या जन्माबरोबरच तो स्वयंभू जन्माला तयार असतो. शिवपूर्वकालच्या सरदारांप्रमाणेच आजकालच्या एकूण एक राजकारणी पक्षांच्या निष्ठा वारांगनेसारख्या चंचल, अस्थिर नि व्यभिचारी असतात. एक कम्युनिस्ट पंथ घेतला, तरी त्यांच्यातही डावे आणि उजवे घरभेद आहेतच. डाव्यांची निष्ठा चीनला विकलेली, तर उजव्यांच्या अकला सोवियत पेढीवर गहाण पडलेल्या. सोशालिस्टांतही संयुक्त आणि प्रजा अशी दोन घराणी. शिवाय, या पक्षातील कोण पक्षी भुर्रकन उडून दुस-या पक्षांच्या पिंज-यात जाईल, याचा नेम नाही. रंगभूमीवरील नटनट्याच्या वेषांतराप्रमाणे असले पक्षांतर पुष्कळ वेळा टोळ्याटोळ्यांनी होत असते. मग शिलकी गाळ गदळाचे इनामदार, `कैलासवासी’ शब्दाप्रमाणे अमका तमका काँग्रेसवासी झाला अशा टिंगलबाज शापांनी आपल्या मनाचे नि संतापाचे समाधान करून घेत असतात. ज्यांच्या निष्ठा स्वार्थाच्या बाजारात लिलावाने विकायला मांडलेल्या, त्यांच्या स्वाभिमानाची किंमत किती टोले कवड्या दमड्या करायची? पक्षप्रवेशालाच त्यांना आपल्या स्वाभिमानाची मुंडी मुरगाळून, पक्षाभिमानाचे बाशिंग बांधावे लागते.
लेख २
नंगेसे खुदाभी डरता है
प्रत्येक पक्षात भगतगणांचा बाप्तिस्मा उरकण्यासाठी बौद्धिके म्हणजे पक्षमहात्म्यांचे गोमुत्र आकण्ठ पाजण्याचा विधी साजरा करण्यात येत असतो. सोवियत रशियासारख्या कम्युनिष्टी देशात या विधीला `ब्रेन वॉशिंग’ ऊर्फ `मगजशुद्धी’ असे साळसूद नाव दिलेले असते. या बौद्धिकांच्या अखंड डोस-पाजणीने मनुष्य स्वतःला नि स्वत्वाला विसरतो. स्वाभिमानाला पारखा होतो. गणगोताची पर्वा झुगारतो आणि पक्षनेते गुरुवर्य जसे जे नि जितके शिकवतील, पढवतील, तेवढीच नि तीच पोपटपंची चतुरकी जान बडबडत तो मोकाट सुटतो. जगातल्या आधिव्याधींचा निपटनिचरा करण्याचे ब्रह्माण्डज्ञान फक्त बाप्तिस्मा घेतलेल्या माझ्याच पक्षाच्या खाकोटीला आहे, अशा उन्नत्त भावनेने व्यवहारात तो माजलेल्या पोळासारखा वावरू लागतो. पक्षाच्या पिंज-याबाहेर त्याला पडता येत नाही. पडलाच तर, पाळलेल्या पक्ष्याला बाहेरचे जातभाई पक्षी जसे टोचटोचून घायाळ करतात किंवा ठारही मारतात, तीच अवस्था पक्षनेते त्याची करतात नि करवितात. पढविलेल्या पाठापेक्षा अवांतर स्वतंत्र विचारांचा उद्गारही काढण्याची त्याला शहामत होत नाही, स्वप्नातसुद्धा स्वाभिमानाची कल्पना येता कामा नये, येवढा परिणाम त्या बौद्धिकांनी केलेला असतो.
निरनिराळ्या राजकारणी मोक्षांची दुकाने थोटून बसलेले सारेच पक्ष जर भारताच्या उत्कर्षासाठी मरेस्तोवर जगण्याच्या प्रतिज्ञेने वावरताहेत, तर त्यांच्यात सदैव मतभेदांचे वणवे का पेटलेले असतात? कम्युनिस्टांच्या डाव्या उजव्यात आडवा विस्तव जात नाही. सोशालिस्टातही हीच त-हा. राष्ट्रीय स्वयंसवेक संघ आणि जनसंघ, खरे पाहता, एकाच नाण्याच्या दोन बाजू – पण त्यांच्यातही मतभेदाची `बर्लिन वॉल’ हे म्हणे. कदाचित हा देखावा राजकारणी डावपेचातही असण्याचा संभव फार. डावे कम्युनिस्ट चीनवादी, उजवे सोवियतवादी आणि हे दोघे पक्ष इतर पक्षांना अमेरिकावादी म्हणून खिजवतात. डाव्या कम्युनिस्टांनी चीनचे आक्रमण हे `आक्रमण नसून ते भारताच्या उद्धारासाठी आलेले मोक्षदायी अगमन’ होते, असा टाहो फोडला. या ठिकाणी श्री. कण्टकार्जुनाच्या विद्वद्मान्य `कण्टकांजलि’मधील एक कथा सांगण्यासारखी आहे. तिचा मराठी अनुवाद असा –
पारवे आणि ससाणे
खुराडे उघडे होते. मालक कुठे तरी दूर होता. खुषीत येऊन पारवे घुमत होते. तेवढ्यात ससाण्याने झेप टाकून त्यांच्यातल्या काहींचा फराळादाखल फन्ना केला. वाचलेल्यांना तो आदबीने लवून म्हणाला - `जिवलगानो, येतो मी. सुखी असा. तुमच्या हद्दीत मी जे हे पाऊल टाकले, ते केवळ प्रेमाने, हे जाणून क्षमा करा.’
चीनी आक्रमणाबद्दल उजव्यांनी विरोध केला. त्यांचे म्हणणे, भारताचा मोक्ष सोविएतांच्या खिशात. कोण जाणे, कोण कुणाच्या खिशात बसला आहे, का घशात उतरला वा उतरत आहे. एवढं मात्र खरे की अचाट, अफाट नि अलोट कर्जबाजारीपणामुळे, आमच्या श्वेतांबरी नि सत्ताधारी काँग्रेजी भोप्यांनी कोणकोणत्या धनकनकसंपन्न परराष्ट्रांच्या घशात भारत कोंबण्याचा मनसुबा रचला आहे, याचा अंदाज घ्यायला मोठमोठ्या मगजबाज गणित्यांनी हात टेकले, तेथे आजच कशाला हा खिशा-घशाचा वाद?
गेली १८-१९ वर्षे मध्यवर्ती काँग्रेजी सत्ताधा-यांच्या फंडातून राष्ट्रवादाचे फतव्यावर फतवे निघत आहेत. कम्युनिस्ट कंपू तर थेट विश्वबंधुत्वाच्या चंद्रलोकावर केव्हाच ठाण मांडून बसलेला. राष्ट्रवादाने आणि विश्ववादाने अमर्याद बेफाम नि बेभान होऊन आम्ही हिंदू-मुस्लिम भाई भाई, हिंदी चिनी भाई भाई, अशा कंठशोषी आरोळ्यांची कसली रक्तबंबाळ फलश्रुती पदरात पडली, याची आठवण बुझून नष्ट व्हायला निदान चालू शतक तरी पुरे व्हायला पाहिजे. ज्यांचा आम्ही शुद्ध अजागळपणे `भाई भाई’ म्हणून उदो उदो केला, ते इस्लामी पाकिस्तान आणि चीन आज एकजिव्ह होऊन भारताची खांडोळी करायला रात्रंदिवस दिसेल सुचेल त्या संधीची अखंड वाट पाहात उभे आहेत. तरीही `ते आमचे शब्द आहेत’ हे उघडपणाने जाहीर करण्याची सत्ताधारी दिल्लीकर काँग्रेजियाला हिंमत होत नाही.
राष्ट्रवादाच्या नि विश्वबंधुत्वाच्या कल्पना करणारे मतलबी शहाणे तरी कितीसे बोलल्याप्रमाणे चालतात? कोणीही नाही. ही सारी बोलघेवडी पुराणे श्रद्धावान भोळसट अडाण्यांसाठी असतात. जो तो आपापल्या स्वतःपुरताच पाहणारा आणि वागणारा स्वार्थी असतो. याला अजागळ अपवाद नि तो मराठ्यांच्या महाराष्ट्र राज्याचा! इतर सर्व राज्यांनी आपापले कान स्वाभिमानाच्या टापशीने स्वतःच्या मुंडक्यांवर जपून ठेवलेले आहेत. फक्त महाराष्ट्र राज्याने स्वतःचे कान दिल्लीच्या चिमटीत ठेवलेले आहेत. कोणतीही स्वराज्यवादी पावले टाकताना म-हाठी राज्याचे म-हाठी कारभारी `दिल्ली काय म्हणेल?’ या चिंतेने व्यग्र असलेले दिसतात.
मध्यंतरी `भारताची राष्ट्रभाषा हिंदी’ची दिल्लीकरांची फर्माने सर्वत्र जाहीर होताच, मद्रास राज्यातल्या मद्राश्यांनी हिंदीविरुद्ध आग्यावेताळी आंदोलन चालू केले. तात्काळ, केंद्रातल्या दोन मद्रासी मंत्र्यांनी तडाड आपले राजीनामे दिले आणि काँग्रेसचे अध्यक्ष महासय कामराज, (म्हणजे सत्ताधारी काँग्रेस गणंगावर अगदी थेट पंतप्रधानावर हुकमत चालवणारे झारथाट गिरमिटधारी) त्यांनी काय केले? ते तर राष्ट्रवादाचे अभिषिक्त नरपती. त्यांनी आपल्या मद्रदेशीय कारभा-यांना जाहीर हुकूम सोडला की केन्द्राकडून हिंदी भाषेत येणारे सारे हुकूम फर्मान बेधडक जाळून टाका. कोठे गेला त्यांचा नि मद्रास राज्यकर्त्यांचा राष्ट्रवाद? आणि दिल्लीवाल्या सत्ताधीशांनी कितीसे त्यांचे कान उपटले? अहो कसले कान उपटतात! नुसते हात चोळीत बसले नाहीत तर तंगड्यात शेपट्या घालून चूपचाप बसले.
स्व-भाषिक राज्यात स्व-भाषिकांचाच हितवाद राज्यकर्त्यांनी तळहाताच्या फोडासारखा जपला पाहिजे. परप्रांतीय उप-यांची वर्दळ राज्यात चालू देता कामा नये. भाषिक राज्य-स्थापनेचा हा मूळ उद्देश. पण तो महाराष्ट्र राज्याच्या कारभा-यांना अजूनही नीटसा हाताळता आलेला नाही. अगदी परवाची कथा ऐका. म्हैसूर राज्यातल्या शिमोगा जिल्ह्यातल्या एका जंगलात केरळीय उप-यांनी बेकायदेशीर वसाहत तयार केली. जंगलातील लाकडे तोडून व्यापार चालू केला. तेथे एक चर्चही उभारले. उप-यांची संख्या अंदाजे ३ हजारांवर होते. म्हैसूरचे मुख्य प्रधान निजलिंगप्पा यांचे नजरेला केरळी उप-यांचे हे बेकायदेशीर आक्रमण येताच त्यांनी त्यांना एक आठवड्यात चले जावची नोटीस दिली. हे उपरे नोटीशीच्या पोटिसाला धूप घालण्याइतके थोडेच सभ्यतेच्या मर्यादेतले असतात! सभ्यपणाच्या सगळ्या मर्यादा झुगारून केवळ पाहणा-यांच्या नजरेवर मेहरबानी करण्यासाठी फक्त दीड दोन हाताची लुंगी गुंडाळून मन मानेल तेथे घुसणारे घुश्ये. त्यांनी निजलिंगप्पाला अंगठा दाखवताच त्यांनी ताडकन् पोलिसी फौज पाठवून, केरळी उप-यांना झोपड्या झोपड्यातून बाहेर ओढून, त्या पेटवून दिल्या, त्यांचे ते चर्चही जाळून भस्मसात केले. सारी वसाहत नष्ट केली. `दिल्लीवाले काय म्हणतील?’ या भ्याड चिंतेला त्यांनी सफाचट ठोकरून, म्हैसूर म्हैसू-यांसाठी, हे तत्त्व अक्षरशः अंमलात आणले. थोतांडी राष्ट्रवादाचा त्यांनी मुलाहिजा राखला नाही. या वेळीही `भारतीय व्यक्तीला भारतात कोठेही राहण्याचा, जगण्याचा हक्क आहे,’ या घटनेतल्या श्रुति, स्मृती-पुराणोक्त सूत्राकडे बोट दाखवून, म्हैसूरचे कान वाजविण्याची केंद्री मठपतींना हिम्मत झाली नाही. कारण नंगेसे खुदाभी डरता है.
नंगेसे खुदाभी डरता है!
`जे नंगे होत नाहीत, ते मोक्षाला जाऊ शकत नाहीत. नंग्याला खुदाही डरतो, आणि राज्यकर्त्यालाही खरे भय नंग्याचेच वाटते. या भारताला मुक्त केले, ते एका नंग्या फकिरानेच. देवांमध्येही जो नंगा, तोच महादेव ठरला. जो नंगा नाही, त्याचे म्हणणे कोणी ऐकून घेत नाही. तेव्हा गड्या, तूही नंगा हो.’
(कण्टकांजलीः पान ३२)
बंगालची फाळणी झाली. बंगालभर बंगाल्यांचा आरडाओरडा चालू झाला, त्या प्रसंगी महाराष्ट्राचे लोकमान्य प्रतिनिधी टिळक जातीने तिकडे धावले. उभा हिंदुस्थान जागा करण्यासाठी देशभर त्यांनी दौरे काढले एकजात सगळ्या म-हाठी पत्रांना वंगभंगविरुद्ध आंदोलनाची ज्वाला उफाळण्याच्या कामाला जुंपले. बंगाली नेत्यांच्या खांद्याला खांदा भिडवून अखेर वंगभंग रद्द करविला. महाराष्ट्राने जिवाचे रान करून, बंगालच्या छातीवर रोखलेली कु-हाड वरच्या वर झेलून त्याची मुक्तता केली. आज तोच बंगाल महाराष्ट्रावर सापासारखा उलटला आहे. कलकत्ता येथील महाराष्ट्र निवास ही फार जुनी संस्था आहे. काही दिवसांपूर्वी कोणी तरी त्या इमारतीवर काळे निशाण लावले. निवासाच्या संस्थापकांना या घटनेची काही कल्पनाच नव्हती. अचानक कोणीतरी (बहुतेक लावणारांनीच) ते काळे निशाण काढून टाकले. लगेच दीड-दोनशे बंगाली महाराष्ट्र निवासावर चाल करून आले आणि कोणी नि का निशाण काढले? याचा जबाब व्यवस्थापकास खडसून विचारू लागले.
लावले केव्हा नि कोणी आणि काढले केव्हा नि कोणी, याची व्यवस्थापकांना कल्पनाच नव्हती, तर ते काय खुलासा करणार? बस्स. वढे निमित्त बंगाली गुंडांना दंगल माजवायला पुरेसे झाले. त्यांनी महाराष्ट्र निवासवर भयंकर दगडफेक केली. तावदाने फोडली. खिडक्या मोडल्या. हा सर्व `राष्ट्रवादी’ मंगल सोहळा चालू असता, महाराष्ट्राला नि मराठ्यांना अचकट विचकट शिव्यांचेही दान चालू होते. अखेर `म-हाठेको बंगालसे तडीपार, हकाल देंगे’ इत्यादी नि वगैरे पोटभर धमक्या दंगलखोरांनी दिल्या नि गेले. सारांश, म-हाठेतर इतर सर्व भाषिक राज्यांत महाराष्ट्र आणि म-हाठ्यांचा भयंकर द्वेष राजरोस भडकतो आहे. प्रत्येक राज्यात म-हाठ्यांच्या हकालपट्टीची धमक्यांची भाषा चालू आहे आणि आमच्या महाराष्ट्र राज्यात परकीय उप-यांना `आव जाव मकान तुम्हारा’चे सुस्वागतम आणि खास संरक्षण. त्यांनी वाटेल तेथे हातभट्ट्या चालवाव्या, परदेशाहून चोरून आणलेल्या स्मगल्ड जिनसांचा व्यापार खुशाल उघड्या फुटपाथवर उभे राहून चालवावा, झोपडपट्ट्यांतून कुंटणखाने, दारूचे पिठे चालवावे, मन मानेल तेथे गुंडगिरी करावी, पाण्याचे हायड्रंट उघडून लाखो गॅलन पाणी बरबाद करावे, हत्तीच्या अंगाएवढ्या नळानाही भोके पाडून पाणी वापरावे, ना आमचे सरकार, ना पोलीस, ना ती म्युनिसिपल कार्पोरेशन, कोण्णी कोण्णी त्या उप-या महात्म्यांच्या या समाजविध्वंसक खटाटोपांना अडवायला समर्थ. एरव्हीचा हडेलपह्पीचा दिमाख फक्त स्थानिक म-हाठी मुंबईकर आणि इतर गोरगरीब पोटार्थी जनतेला धमकावण्यासाठी नि छळण्यासाठी. परप्रांतीय उप-यांविरुद्ध महाराष्ट्र सरकारची करांगळीही चुकून हलायची नाही. आमचे राज्य कट्टर राष्ट्रवादी ना?! इतर भाषिक राज्यांनी राष्ट्रवाद पायतणाखाली चिरडला आणि म-हाठी जनतेच्या हकालपट्ट्या केल्या, तरी आम्हाला नि आमच्या राज्यकारभा-यांना ना लाज, ना शरम, ना दोन डोळ्यांची स्वकीयांबद्दलची मुर्वत!
कंपनी सरकारच्या वेळीची एक दंतकथा ऐकण्यात येते. ती अशी. पलटणीतले शिपायी स्वतः पेज पिऊन गो-या अंमलदारांना भात चारीत असत आणि ते टोपडे म-हाठी शिपायांच्या त्या आदरातिथ्याबद्दल शिफारसीची पुराणे सांगू लागले का आमच्या अजागळ पूर्वजांना `पितर सरग भये’चा हर्षवायू होत असे तसलाच काहीसा मामला महाराष्ट्र राज्यात सध्या चालू आहे की काय न कळे.
मुंबईची जुनी वस्ती फक्त १४ लाखांची होती. आज ती ४६.४७ लाखांच्या वर गेली आहे. एवढा चौपट फुगवटा आला कशाने? १४ लाख स्थायिक मुंबईकरांच्या संतती-वर्धनाचा हा परिणाम मानण्याइतका महामूर्ख जन्माला आल्याचे दिसत नाही. हा सारा फुगवटा बाहेरून आलेल्या आणि येथे येऊन सर्वच क्षेत्रात शिरजोर आणि दंगलखोर बनलेल्या उप-यांनीच फुगविलेला आहे. हे पाहणारांना दिसते, पण राष्ट्रवाद आणि कॉस्मोपॉलिटनीझमची कावीळ झालेल्या महाराष्ट्र सरकारला मात्र दिसत नाही.
लेख ३
गोळीला जनता पोळीला पुढारी
कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या पिसा-याचे पंख चिकटवून घेतल्याशिवाय आजकाल कोणत्याही हिकमती माणसाला जगण्याचा दुसरा मार्गच आढळेनासा झाला आहे. जुन्याजमान्यात जहाल आणि मवाळ असे दोनच राजकारणी गट महाराष्ट्रात होते. पण ते एकमेकांची तोंडेही न पाहण्याइतके बेजबबाबदार, मगरूर पक्ष नव्हते. अनेक सार्वजनिक हितवादाच्या प्रश्नांवर ब्रिटीश सरकारशी दोन हात करण्याच्या प्रसंगी, दोन्ही गटाचे म्होरके एकाच व्यासपीठावर येत असत. काही मुद्यांवर मतभेद असले आणि ते फक्त आचार-विचार-भिन्नतेचे असत. तरी आजकालच्या पक्षांप्रमाणे परस्परात आडवा उभा विस्तव जायचाच नाही. इतक्या कमालद्वेषाचे, तिटका-याचे नि मत्सराचे वातावरण केव्हाही नव्हते. सध्याच्या राजकारणी पक्षाच्या हातून राष्ट्रहिताच्या काही ठळक कामगि-या पार पडलेल्या नसल्या, किंवा समजा असल्या, तरी परस्परात आणि समजातही वैरभावाचे, सूडाचे आणि दंगलीचे निखारे अखंड पेडते, भडकते ठेवण्याची सैतानी कामगिरी मात्र त्यांनी रगड बजावली नि बजावीत असतात. दोन भिन्न पक्षांचे प्राणी समोरासमोर येताच बुज-या नि मारक्या बैलांसारखे एकमेकांकडे नाक फेंदारून, लाल डोळे करून बघू लागतात. जाहीर सभांतून विरोधी पक्षांवर टीका करताना, मत्सराने बरबटलेला आपल्या वांवदुकी जिभेचा पट्टा पक्षनेते असा बेसुमार चालवितात, की आपण बुद्धिमान सभ्य लोकांची भाषणे ऐकत आहोत, का गुंड मवाल्यांच्या अड्ड्यावर चुकून आलो आहोत, याचे श्रोत्यांना कोडे पडते. हापूस आंबा कापून खायचा का चोखून खायचा, इतका क्षुल्लक जरी मतभेद झाला की लगेच वैराच्या ठिणग्या फुलू लागतात आणि क्षणार्धात समोरच भिन्नमती आसामी `शत्रू नंबर एक’ ठरविण्यात येतो.
ही आक्रस्ताळी, रक्तपिपासून आणि खुनी मनोवृत्ती भारतात कम्युनिस्टांनीच प्रथम आणली. सोवियत रशियात साक्षात नंदनवन डवरले फुललेल्याचे डंके नौबती कितीही दणाणत, असल्या तरी त्या राजवटीचा पाया लक्षावधी माणसांच्या अमानुष रक्तपाताने बरबटलेला आहे. कुत्र्याला प्रथम शिवी हासडावी नि मग बेशक ठार मारावे, अशी इंग्रजीत एक म्हण आहे. सोवियती राजकारणात ही म्हण अक्षरशः पाळली जात असते. जरा का काही मतभेद झाला, नुसता मतभेदाचा संशय आला की लगेच त्या इसमाला मग तो सोवियती कारभारातला किती का उच्च अधिकारावरचा नि दर्जाचा असो, त्याला `ट्रेटर’ (हरामखोर) ठरवरून ताबडतोब ठार मारण्यात आलेले आहे आणि येतही असते. सन १९२० ते २७ सालातले कम्युनिझमचे पहिले प्रवर्तक नि पुढारी असेच खून करून ठार मारण्यात आले. सन १९४०साली फक्त लेनिन स्तानिन बाद करता, पोलितब्यूरोंच्या सोवियती उच्चाधिकार मंडळातल्या १४ मेंबरांपैकी १२ जणांना धडाधड यमसदनाला धाडण्यात आले. सन १९३४साली मध्यवर्ती समितीच्या ७१ मेंबरांपैकी फक्त २४जण चार वर्षे हयात असलेले दिसत होते, बाकीचे ३६जण बेपत्ता झाले (हवेत विरले!) ९ जण सरकारी हुकुमान्वये गोळ्या घालून ठार मारण्यात आले. आज एकदा डोव्हिस्की फोव्हिस्की सोवियत लोकवटीचा कर्तुमर्तुमन्यथा कर्तुम दण्डधा-याच्या अधिकारात नि दिमाखात मिरवताना दिसावा, तर उद्या त्याला हरामखोर ठरवून गोळीबाराने खतम करण्यात यावा, असे प्रकार तिकडे रगड झाले. हरमाखोर श्रेष्ठाच्या पाठोपाठ त्यांच्या अनुयायांच्याही शेकड्यांनी कत्तली व्हायच्या हे ठरलेलेच. सोवियत रशियात स्वतंत्र विचारांना बिलकूल मुभा नाही. लेखकाने किंवा एखाद्या कवीने सोवियती सत्तागुंडांच्या धोरणाविरुद्ध पुसटसा जरी उल्लेख केल्याचे दिसले किंवा कोणी कानफाट्याने कळविले, का भरलीच त्याची पनोती. असे काही स्पष्टवक्ते लेखक-कवी जिवाच्या भयाने रशिया सोडून परागंदा झाल्याच्या हकिकती पुष्कळांनी एकल्या, वाचल्या असतील. जेथील स्वदेशाभिमानी नि स्वातंत्र्यप्रेमी लक्षावधी जनतेला एक तर सायबेरियासारख्या दूर उजाड प्रदेशातल्या गुलामखान्यात डांबले नाही, किंवा त्यांची सर्रास कत्तल केली नाही, असा सोवियतांचा भक्ष्यस्थानी पडलेला एकही देश दाखविता येणार नाही. सोवियती कबजातील पूर्वजर्मनीच्या बर्लिन वॉलची कहाणी आजही जो जो तिथे जातो न पाहतो त्याच्या डोळ्यात अश्रूंचा धबधबा फोडते. जगात पुष्कळ राज्यक्रांत्या झाल्या नि नवीन राजवटी निर्माण झाल्या, पण सोवियतसारखी मानवी रक्तप्राशनाला सोकावलेली राजवट म्हणा लोकवट म्हणा फक्त एकमेव तीच. लोकवटीपेक्षा त्या अवस्थेला झोण्डवट म्हणणेच यथार्थ ठरेल. भारतातले कम्युनिस्ट चळवळे तीच रक्तपाती आक्रस्ताळी परंपरा येथे भक्कम रुजविण्याच्या खटाटोपात अखंड गढलेले असतात. कोणाला केव्हा ते `शत्रू नंबर एक’ ठरवतील नि त्याच्या नरडीचा घोट घेतील, त्याचा नेम नाही.
आज नुसते ते वाचिक लिखित शब्दांनी हे करीत असतात, कारण अजून त्यांच्या हाती भारताची सत्ता आलेली नाही. पण भारताच्या नि भारतीयांच्या कठोर दुर्दैवाने चुकून आलीच, तर आसेतुहिमाचल रक्तपाती खाटिकखाना केल्याशिवाय राहणार नाहीत. उजवे कम्युनिस्ट रशियावादी नि डावे चीनवादी, हा सारा भारतीयांच्या भुलभुलावणीचा फसवा देखावा आहे. अंतर्यामी दोघेही एकजिनशी एकवटलेलेच आहेत. आज त्यांचे पाय भारतभूमीवर असले, तरी डोकी मात्र रशिया-चीनच्या सत्तेच्या पेढीवर गहाण पडलेली आहेत.
आग्यावेताळ कम्युनिस्टांच्या येथील उत्पत्तीपासून इतर राजकारणी पक्ष एकमेकांकडे कट्टर शत्रूत्वाच्या तिरक्या ताठर नजरेने पाहू लागले. राजकारणी पक्षातील या वैमनस्यामुळे, महाराष्ट्रातील माणसा-माणसातील आपुलकी नष्ट झाली; कुटुंबव्यवस्था रसातळाला गेली; व्यक्तिमात्राच्या स्वाभिमानाला तडे गेले; कोणताही गुंता सामोपचाराने सोडविण्याची भावनाच मावळली आणि `ऊठ सोट्या तुझे राज्य’ असली बेगुमान बेदरकारी बोकाळली. म्हणजे शिवपूर्वकालापेक्षा म-हाठी जनतेची वैयक्तिक, सासांरिक, सामाजिक, धार्मिक अवस्था आज विलक्षण कोडेबाज घोटाळ्याची होऊन बसली आहे. सगळयांनी आपापल्या स्वाभिमानाच्या माना निरनिराळ्या पक्षनेत्यांच्या मुठीत आपणहून दिलेल्या आहेत; आणि त्यांच्यापासून शिकले काय? तर आचारविचारांची बेगुमान बेदरकारी, आक्रस्ताळीपणा आणि दण्डुकेबाजी!
संस्थेच्या भरमसाट फुगवणीमुळे नाळगुदासारखा सुजलेला आणि गेली १८-१९ वर्षे जुम्या संस्थानिकांच्या वारसदारी थाटाने सत्ताधारी बनलेल्या काँग्रेस पक्षाच्या राजकारणी आबादाबाचा महिमा सध्या `उपरसे और बनी, अंदरकी बात खुदा जाने’ अशा अवस्थेत आहे. स्वराज्य मिळाल्यावर काँग्रेसपक्षाच्या मठाला टाळे लावा, असा म. गांधींनी स्पष्ट इशारा दिलेला होता. स्वातंत्र्याच्या आंदोलन काळातच खरे म्हटले तर काँग्रेसची खरी कामगिरी झाली. कारण, तेव्हा म. गांधी आंदोलनाच्या झेंड्यावर उभे होते. त्या काळी कम्युनिस्टादी सगळे पक्ष काँग्रेसच्या वळचणीने बोलत चालत होते. आज डावे-उजवे म्हणविणारे बहुतेक कम्युनिस्ट पुढारी खांद्यावर खादीची गाठोडी घेऊन खादी विकायाल फेरीवाल्यांसारखे घरोघर दारोदार भटकत होते. प्रजा समाजवादीही तेच करीत होते. पण ब्रिटिशांनी स्वराज्याची झोळी दाखविताच ती आपल्या खादी टोपीत ओतून घ्यायला काँग्रेसवाले पुढेच असल्यामुळे, साहजिकच ते दान त्यांच्या हातात पडले.
काँग्रेसमध्ये घुसायला घुश्यांच्या लायकी नालायकीचा विशेष मुद्दा कसलाच नव्हता आणि आजही नाही. पावलीला पट्टी न्यायाने एक पावली भिरकावली, नखशिखांत पांढरीफेक खाकी पांघरली का बन गया काँग्रेजी आदमी. अचाट बुद्धी चालवून बळेच लक्ष्मी मिळविण्याच्या सुप्तगुप्त फंदाने फुरफुरलेल्या शेकडो अलबत्या गलबत्यानी काँग्रेसच्या सताड उघड्या कर्मशाळेचा आसरा घेतला. गावोगावचे संभावित गुंड नि पुंड खादीधारी बनले. नाक्यावरच्या गणेस टेबलरपासून तो थेट सचिवालयातील मंत्री महाशयापर्यंत त्यांच्या वगवशिल्याची साखळी बेमालूम तयार झाली. टाळक्यावर गांधी टोपी चढली रे चढली, का हवा तो गेन्या गंप्या मंत्र्याच्या दिमाखात जिल्ह्याच्या कलेक्टरलाही दमदाटीचा अक्कलकाढा पाजू शकतो. तशात सचिवालयात ठाण मांडून कोंदाटलेली स्वराज्याची महासागरी गंगा आखडत आखडत छोटेखानी झ-यासारखी ग्रामपंचायत, तालुका नि जिल्हा परिषदेच्या चिंचोळ्या खबदाडात अलिकडे घुसल्यामुळे, गावोगावचे गुंडेपुंडे त्याच गावातले देशपांडे म्हणून राज्यकारभारत और दिमाखाने मिरवू लागले. शिवाय, भल्याबु-या पूर्वाश्रमात जिचे दर्शनही चुकून कधी झाले नाही, ती महामाया लक्ष्मीच हातात खेळू लागल्यामुळे शेकडो वगळ्यांच्या बापजाद्यांच्या काळच्या केंबळी झोपड्यांच्या जागी टोलेजंग इमले उभे राहिल्याची किमया घडू लागली आहे. एरव्हीच्या साध्या सरळ व्यवहारातल्या संभाव्य आतबट्ट्याचा बट्टा आता त्यांच्यापासून फार दूर पळालेला आढळतो. प्रकृतीतही भलताच बदल होतो. पचनशक्ती अजीर्णप्रुफ बनते, कितीही पैका खाल्ला तरी त्यांना साधा ढेकरही चुकून यायचा नाही आणि आजूबाजूच्या इतरेजनांनी मुद्या पुराव्यानिशी तो ओकविण्याचा कधी उपद्व्याप केलाच, तर सफेद टोपीच्या वगवशिल्याची लागण संत्र्यापासून मंत्र्यापर्यंत जुळलेली खिळलेली असल्यामुळे, बदनामीचा बिब्बा अखेर तक्रारखोरांच्या अंगावर ठसठशीत फुलतो.
लोकहितवादाचा मुखवटा चढविलेल्या काँग्रेस कम्युनिष्टादि सर्व पक्षांनी आपापल्या प्रांगणात नानारंगी डाळ दाण्यांची मुबलक पखरण करून ठेवल्यामुळे, शेकडो, हजारो कबुतरे, पारवे, चिमण्या तेथे आकर्षिल्या जातात. सध्याच्या बेकारीच्या नि दुष्काळाच्या जमान्यात पारवे कबुतरांच्या बरोबरच अनेक वावदूक पोपटही सामील होतात. पक्षांना पोपटाची फार जरूर असते. पक्षांच्या नि पक्षनेत्यांच्या माहात्म्यांची पोपटपंची करायला कबुतर पारव्यांपेक्षा पोपट फार पटाईत. पारवे कबुतरे फक्त घुमाणा घालतात. चिमण्या चिवचिवाट करतात म्हणून पक्षीय म्होरक्यांचा ओढा पोपटांकडे विशेष. तशात एखादा पोपट `पत्रकार’ असला, तर त्याला पिंज-यात न ठेवता त्याच पंख कातरून मनगटावर खेळत ठेवण्याची ते विशेष खटपट करतात. अपक्ष स्वतंत्र बाण्याचा कितीही बहाणा करणारा पत्रकार-पोपट असो, त्याला पूर्व जर्मनीतली गोडगोड फळे चारून `भजनी’ लावून ठेवण्याची युगत कम्युनिस्ट पक्षनेत्यांना उत्तम साधलेली आहे. `मी अपक्ष, मी स्वतंत्र’ म्हणून तो बाट्या पत्रकार नाकाने कितीही कांदे सोलीत असला, तरी जनतेच्या मनाच्या लाजेकाजेसाठी-कम्युनिस्टांच्या चुलीवर त्याच्याच तांदळाचा भात गुपचूप शिजवून, शेजारी स्वतःच्या माजघरात बसून बकाणतो. आपण त्या गावचेच नव्हत, हा त्याचा बहाणा पाहणारांना दिसत नाही, असे थोडेच आहे? पण भ्रष्टाचाराच्या सध्याच्या जमान्यात सब घोडे बारा टक्के भावानेच विकले जातात.
सकाळ गेली, संध्याकाळची वाट काय, अशा अवस्थेतील गोरगरीब श्रमजीवी जनतेच्या उद्धाराच्या प्रतिज्ञा-कंकणे चढविलेले कम्युनिस्ट पुढारी वर्षातून आठ दहा वेळा विमानाने भुरकन रशियादि युरोपीय अनेक देशांत जातात येतात कसे? एवढा पैसा त्यांना कुठून नि मिळतो कसा? हे एक आजवर कोणाला न सुटलेले कोडेच आहे. बामणेतरी आंदोलनाच्या जमान्यात मीही मंबई ते नागपूर आणि हुबळी गोव्यापर्यंत व्याख्यानांचे दौरे काढलेले आहेत. शहरे, तालुके, पेटे आणि खेडी मी फिरलेलो आहे. पण प्रत्येकवेळी दामाजीपंताचा प्रश्न समोर उभा ठाकायचा. ज्या ठिकाणचे आमंत्रण यायचे, तेथील मंडळींना मी स्पष्ट सांगायचा की `बाबांनो, जाण्या-येण्याचा खर्च तुम्हाला करावा लागेल. जेवणासाठी साधी खेडुती झुणकाभाकर असली तरी चालेल पण खर्चाची वाहनांची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल.’ समाजजाजगृतीसाठी घराबाहेर पडायचे ते कफल्लक अवस्थेत आणि परतायचे तेही त्याच अवस्थेच्या थाटात. महाराष्ट्रातले एकूणेक जिल्हे मी पायदळी घातले. लहानसान खेडीही सुटली नाही. लोकांनी प्रत्येक मुक्कामापुरती वाहनांची नि प्रवासखर्चाची बाजू उचलायची नि मी व्याख्याने झोडायची अशी आयुष्यातली किमान वीस वर्षे तरी खर्ची पडलेली आहेत. कोणी मला देणग्या दिल्या नाहीत मी घेतल्याही नाहीत. मागास बहुजन समाजात शिक्षण-प्रचार नि स्पृश्यता-विध्वंस या दोनच मुद्यांवर माझ्या प्रचाराचा कटाक्ष असे आणि चालू घडीची मराठी मंत्रिमंडळे आमदारक्या खासदारक्यातील त्या समाजातील व्यक्तिंचा पुढारपणा पाहिला, म्हणजे माझी निरिच्छ, निर्लोभ मागास जनसेवा पुष्कळच फलद्रुप झाली, असे समाधान न मानण्याइतका पुरावा खास आढळतो. उच्च पदव्यांलकृत असलेल्या ज्या काही मराठी बांधवांना अलिकडे आपण स्वयंभू सुसंस्कृत असल्याचा गर्व झाल्यासारखा दिसतो, त्यांनी ३०-४० वर्षांपूर्वी आपण कोठे कोणत्या अवस्थेत होतो, याची किंचित तरी प्रामाणिक जाणीव नि आठवण ठेवली, तरी त्याच्या गर्वाचे ठाण अस्थानी असल्याचा साक्षात्कार त्यांना होईलसे वाटते.
राजकारणी पक्ष आणि ट्रेड युनियनने म्हणजे म्होरक्याच्या कामधेनू गंगाजळी बनल्या आहेत. कित्येकांच्या लाखो रुपयांच्या स्थावर मिळकती ठिकठिकाणी झाल्या आहेत. कित्येकांनी हजारो रुपये पागड्या भरून स्वतःच्या निवासासाठी आलिशान फ्लॅट मिळविलेले आहेत. कित्येकांच्या मोठमोठ्या व्यापाराक गुप्त भागीदा-या आहेत. युनियनच्या वर्गणीची लाखो रुपयाची लक्ष्मी दरमहा हातात चलनी खेळत असते ती निराळीच, श्रमजीवी जनतेकडून हुकमे हुकूम गोळा केलेल्या पैशावर गबर झालेला हा नवीन लाखाधिशांचा वर्ग निर्माण झालेला आहे. राजकारणी पक्ष आणि ट्रेड युनियन्स ही अचाट बुद्धी चालवून अफाट लक्ष्मी मिळविण्याचा सोस असणा-या हिकमती खटपट्यांचा राजरोस व्यापार होऊन बसला आहे. यात जनतोद्धार नाही, राष्ट्रोद्धार नाही, आहे तो फक्त पक्षनेत्याचा आणि युनियने चालविणा-याचा आत्मोद्धार! पक्षीय आणि युनियनी वर्तुळ्याच्या कक्षेत अडकलेल्या पाठचाल्यांच्या नि पायचाट्यांच्या लक्षात या व्यापाराचे एटक फारसे येत नाही, असे नाही. पण ते तरी काय करणार?
अटकली गाय, फटके खाय, वरिष्ठ नेत्यांच्या उबा-याच्या वरच्या थरात असलेल्या गणंगांना पोसून गोंजारून गुबगुबीत राखले, म्हणजे शेंड्यावरच्या गणंगेश्वरांना अंतररंगाचा बाहेरच्या जागाला फारसा थांगपत्ता लागत नाही. महिन्याच्या महिन्याला युनियनच्या वर्गण्या बिनतक्रार भराव्या, खुद्दांचा हुकून सुटेल तेव्हा संप मोर्चे काढावे, दंगली कराव्या, आगी लावाव्या, लाठीमार खावा, तुरुंगात जावे, या पलिकडे हे असे का नि ते तसे का? असले सवालटाकण्याची पाठचाल्या अनुयायांना शहामतच नसते. मार पडतो, गोळीबार होतो, तो सा-या पाठचाल्यांवर, गोळी लागून ठार झालेला आणि लाठीमारात जखमी नि निकामी झालेला पक्षनेता अथवा युनियननेता आजवर कोणी एखादा पाहिला आहे काय? परवा ऑल इंडिया काँग्रेसचे अधिवेशन माटुंग्याला भरले होते. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण आणि संपूर्ण महाराष्ट्र समित्यांच्या वतीने सडक धडक मोर्चे काढण्यात आले. काही नेत्यांची धक्काबुक्की झाली, बरेचसे पाठचाले पोलिसी लाठीखाली जाम चेचले गेले आणि कित्येक पोलिसी लॉकअपमध्ये अटकले. त्यांना सोडवायला एकही पक्ष किंवा युनियन नेता धावला नाही. सारांश, गोळी लाठीला जनता आणि पोळीला नि हारतु-याला पुढारी महाशय, असले देखावे अलिकडील अनेक आंदोलनांत लोकांनी पाहिलेले आहेत. तरीही त्यांच्या भजनी लागलेल्या लोकांना हे संत महंत कसल्या मसाल्याच्या मनोवृत्तीचे आहेत, याचा शोध नि बोध घेण्याइतका विचाराचा मगदुरही उरलेला नाही. स्वाभिमानाला मुकलेल्यांची मने अशीच गुलाम नि परस्वाधीन बनतात.
लेख ४
आम्हीच आमचे मित्र नि शत्रू
इंग्लंडादि देशात सामान्यतः फक्त राज्यकर्ता आणि विरोधी असे दोनच पक्ष असतात. आमच्याकडे मात्र पायलीचे पन्नास पक्ष बोकाळलेले. प्रजोत्पादनापेक्षा पक्षोत्पादनाचा जोर मोठा. त्यातही पुन्हा केव्हा कोणता पक्ष आपला मुखवटा बदलील, शेजारच्या एखाद्या पक्षाच्या पोटात जाईल आणि काही काळाने पुन्हा नव्याच नावाने संसार मांडील, याचा नाही. प्रत्येक पक्ष आणि ट्रेड युनियन कपाळावर अखिल भारतीयत्वाचा मळवट फासूनच जन्माला येतो. या `अखिल भारतीय’ बाशिंगाचा सध्या इतका विचका उडालेला आहे का सांगता पुरवत नाही. राहत्या गल्लीच्या बाहेरही ज्यांना कोणी ओळखत नाही, पोस्टमनलाही ज्यांचा ठिकाणा लागत नाही, अशा अनेक संस्था `अखिल भारतीय’ बाशिंगे चढवायला विसरत नाही, आसेतु हिमाचल भारताचा राजकारणी मोक्ष सिद्ध करणारा आमचाचा काय तो एकमेव पक्ष, राष्ट्रवाद फक्त आम्हीच गावा नि तुम्ही ऐकावा, राजकारण काय ते आम्हासीच ठावे, इतरांनी ते आमच्याकडून शिकावे आणि सावलीसारखे आमच्या मागे चालावे, हा प्रत्येक पक्षाचा दावा, चातुर्मासी टाकळ्याप्रमाणे सर्वत्र बोकाळलेल्या पक्षांच्या राजकारणी धामुधुमीमुळे, समाजाच्या सामाजिक उत्थानाचा किंवा संघटनाचा विचारच हद्दपार झाला आहे आणि त्याची कारणेही फार जुनाट मूळ धरून बसलेली आहेत. देशाचे पारतंत्र्य निपटून काढण्यासाठी गेल्या शतकाच्या उत्तरार्धात लो. चिळक प्रभृति जी मंडळी पुढे सरसावली, त्यांनीच `आधी राजकारण का समाजकारण?’ यावर बेसुमार वादावादीच धुळवड, शेणवड खेळली. नॅशनल काँग्रेसच्या पुणे अधिवेशनच्या मंडपात सामाजिक परिषदेचे अधिवेशन भरत असेल तर तो मंडप जाळून भस्मसात करीन ही गर्जना करणारा पुण्याचा व्रात्याग्रणी श्रीधर विठ्ठल दाते टिळक कंपूचाच प्रतिनिधी होता. आंग्लायीची हकालपट्टी होऊन देश स्वतंत्र झाला, स्वातंत्र्याचे राजकारण यशस्वी झाले, का समाजसुधारणा आपोआप होईल, असल्या जोरदार प्रचारामुळे, तेव्हापासून सामाजिक उत्थानाचा आचार नि विचारच लोकांच्या मनातून सफाचाट नाहीसा झाला. आता देश स्वतंत्र झाला, मग आहे कुठे तो सामाजिक जिव्हाळा, ती सामाजिक संघटना, ती कुटुंब व्यवस्था आणि परस्परांतील स्नेहधर्म? सगळ्याचा नायनाट होऊन सध्या व्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तिमहात्म्याची नाटकेच सर्वत्र नाचविली जात आहेत. नाटकेच ती! त्यात कामापुरता मामा, यापेक्षा निराळा जिव्हाळा असणारच कुठून? `माझा मी’ या वृत्तीमुळे एकोपा ही चीजच दुर्मिळ झाली आहे. शेजारधर्मसुद्धा एकलकोंड्या धाटणीचा झाला आहे. शेजारच्य ब्लॉककमध्ये चोर शिरला तर `आपल्याला काय करायचे? त्यांचे ते घेतील पाहून, आपण कशाला त्या भआनगडीत पडा?’ असली मनोवृत्ती! ब्लॉकमध्ये राहणारे ब्लॉक-हेड ना ते! व्यक्तिमहात्म्याचे पूजक! एकमेकांपासून अलग फटकून राहणा-या लोकांनीच राजकारणी – पक्षांच्या छावण्या भरताड फुगविल्लेया असतात. एकेकटी गाय अथवा म्हैस आढळली तर वाघ सहज लीलेने तिचा फन्ना उडवितो, पण गाई-म्हशी दाट कळपाने जात असल्या, तर त्यांच्यावर झाप टाकायची वाघाला हिम्मत होत नाही. तो पळून जातो. हल्ला चढवला तर आपल्याच चिंधोट्या चिंधोट्या उडतील, एवढी अक्कल वाघाला खास असते. पण आजकाल राष्ट्रवाद, समाजवाद, विश्वबंधुत्व इत्यादी फिसाटी चिजा राजकारणी बाजारात सवंग विकल्या जात असल्यामुळे जनावरांची एकोप्याची भावना माणसात उरली नाही.
आजची महाराष्ट्राची अवस्था अशी आहे. इतर भाषिक राज्यात पक्षाचा बुजबुजाट असूनही तेथील राज्यकर्ते आणि लोक महाराष्ट्राइतके फाजील राष्ट्रवादी आणि कॉस्मोपोलिटनचा चोथा चघळणारे नाहीत. त्यांची जातीय आणि भाषिक एकजूट किती बळकट असते, हे मुंबई आदिकरून मोठमोठ्या शहरात घुसलेल्या मद्रासी, आंध्रिय आणि केरळीय उप-यांच्या झुंडीबाज संघटनेवरून म-हाठ्यांना आजमावता येण्यासारखी आहे. इतर राज्यांतल्या लोकांनीच अवघा महाराष्ट्र व्यापून, महाराष्ट्रातल्या म-हाठ्यांना अन्न अस्तर आस-याला महाग करून, स्वदेशातल्या स्वदेशात उपरे नि परके बनविले आहे.राज्य म-हाठी महाराष्ट्राचे का या उप-यांचे? असा सवाल तुमच्या आमच्यापुढे आ वासून उभा आहे.
आमच्या भाबडेपणामुळे आणि आदरातिथ्याच्या फाजील कल्पनांमुळे आक्रमकांची ही भलतीच ब्याद आमच्या मानगुटीवर आम्हीच बसवून घेतली आहे. निरनिराळ्या राजकीय पक्षांच्या पक्षीयतेने म-हाठी बाण्याला वाळवीसारखे पोखरल्यामुळे, आमच्या स्वाभिमानाचा भुस्सा पडला आणि आम्हीच आमचेच वैरी बनलो, अन्याय, आक्रमण किंवा बळजोरी समोर ढळढळीत दिसत असताही प्रतिकाराची धमकच कोणात उरली नाही. तशात एखाद्याने प्रतिकारासाठी हात उचलला, तर त्याच्या तंगड्या मागे खेचणारे हरामखोरच जास्त. महाराष्ट्राच्या म-हाठी वृत्तपत्रासृष्टीकडे जरा नजर टाका. एक दोन अपवाद बाद करता, बाकीच्या सर्व म-हाठी संपादकांनी आपापल्या लेखण्या प्ररप्रांतीय भांडवलदारांच्या चरणी अर्पण केलेल्या, इंग्रजी वृत्तपत्रांकडे पाहावे तर तेथला सारा कारभार नि मुखत्यारी लुंगीधारी दाक्षिणात्यांच्या हातात. ते सारे पडले महाराष्ट्राच्या बोकांडी बसलेले आक्रमक. त्यांना कशाला म-हाठी जनतेचा घाम फुटणार? जातिवंत म-हाठी संपादकच जेथे या ना त्या राजकीय पक्षाचे नि भांडवलदारांचे पट्टेवाले कुत्ते, तेथे इतरांना दोष देण्यात काय अर्थ?’
अशा अवस्थेत महाराष्ट्राच्या पुनरुत्थानाचा मुकाबला कितीही बिकट असला, तरी तो कष्टसाध्य नव्हे, इतकी मनाची कमजोरी म-हाठ्यांनी बाळगता कामा नये. श्री शिवरायाच्या महाराष्ट्राने पुनरुत्थानाच्या अनेक क्रांत्या यशस्वी केलेल्या आहेत. एक काळ असा होता की गेल्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्राच्याच काय, उभ्या भारताच्या पुनरुत्थानाची सूत्रे पुण्याहून महाराष्ट्रच चालवीत, हालवीत होता. जस्टिस रानडे, लो. टिळक, ऑन. गोखले प्रभृति मंडळी राजकारणी सूत्रे हाताळीत होती. सामाजिक उत्थानाच्या कार्यात लोकहितवादी म. फुले, आगरकर, विठ्ठलराव शिंदे, राजर्षि छत्रपती शाहू महाराज इत्यादी अनेक थोर व्यक्तींचे परिश्रम अखंड चालू होते. म-हाठी वृत्तपत्री संपादकांचा महाराष्ट्राभिमान ओसंडत होता. सगळ्याच्या संकलित आचार-विचार-धारावर भारतीय राजकारणाची पावले पडत असत. लाल-बाल-पाल ही अजरामर त्रिमूर्ती या विधानाचा ठळक पुरावाच नव्हे काय? लो. टिळकांच्या अवसानाबरोबर उगवलेल्या गांधी युगाने पुण्याच्या माहात्म्याचे पेकाट मोडले. टिळकयुगात त्यांच्या उपरण्याच्या दशा धरून मिरविणारी सारी कलदार चलनी नाणी बद्द वाजू लागली. गांधीयुगाच्या पहिल्या झपाटयाला त्यांच्या रेशमी पगड्या उडवल्या आणि खादीची थाबडी त्यांच्या मस्तकावर चढली. दिडाण्याच्या खादी टोप्यांनी पागोटी, पगड्या, फेटे पदच्युत केले. बाहेरचे वेषांतर बेमालूम झाले, तर अंतरंगातील राजकारण मतमतांतरांच्या आकार प्राकारांना कालोचित कलाटणी देण्याची समयोचित अक्कलच कोणाजवळ नसल्यामुळे, `भले बुद्धीचे सागर आगर’ म्हणून मिरवणारी बामण मंडळी बोलबोलता गांधीयुगाच्या पचनी पडून समाज राजकारणातली बेकार चिपाड चोथा बनली.
एके काळच्या या मूठभऱ चाणक्यांची म. गांधींना फारशी किंमत वाटली नाही नि जरूरही भासली नाही. टिळकांचा प्रचंड राजकारणी वटवृक्षच उन्मळून पडल्यावर, त्याच्या खांद्या-फांद्यावर बसून `युक्तीच्या चार गोष्टी’ बडबडणारी ती सारी पाखरे वाट मिळेल तिकडे उडाली. डझन अर्धा डझन शहाणे खादीच्या लुंग्या पेहरून, `इथे तरी लौकिकी मानपानाचे उरले सुरले खरकटे चाटायला मिळेल’ म्हणून काँग्रेसवासी होऊन म. गांधींभोवती पिंगा घालीत जमू लागले. पण म. गांधींचे दूरदृष्टीचे धोरण न्यारेच होते. `विराट संख्येचा महाराष्ट्रातला बामणेतरी बहुजन समाज माझ्या मागे आला तर हां हां म्हणता मी इकडची दुनिया तिकडे करीन’ असे त्यांनी जाहीर बोलून दाखविले होते. बुद्धीवादाची आणि सामाजिक-धार्मिक वर्चस्ववादाची फूटपाथी दुकाने थाटून, बामणेतर बहुजन समाजाचा वर्षानुवर्षे तेजोभंग करण्यास सवकलेल्या बामणवर्गाच्या टोल्याला टोला देऊन, त्यांना प्रत्येक क्षेत्रात नामोहरम करण्याइतपत संघटित नि तेजस्वी झालेल्या बामणेतरी आंदोलनाच्या म्होरक्यांना आल्या कच्छपी लावण्याचा म. गांधींनी अटीतटीचा खटाटोप केला. या सुमाराला राजर्षि शाहू शछत्रपतींचा मृत्यू होऊन, बहुजन समाजाच्या भवितव्यावरचा सर्चलाईट विझाला. बामणेतरी पुढा-यांत वैयक्तिक स्वार्थाच्या आणि नेतेपणाच्या हमरातुमरीच्या वावटळी उठल्या.
आंग्लदेवाधिदेवांची हांजीहाजी करून मंत्रिपदाच्या शिंक्यातले लोमी चाटणासाठी ते निवडणुकांच्या डोंबारी उड्या मारू लागले. स्वतःच्या लायकी नालायकीचा अंदाज असो वा नसो, वैयक्तिक मानापानाची हाव, म्हणजे माणसांच्या स्वभावातील एक फार नाजूक मर्म! म. गांधींनी ते बिनचूक हेरून काही बामणेतरी पुढा-यांना आंग्लायी मानमान्यतेपेक्षा काँग्रेसी माहात्म्याच्या वैभवाचे मधाचे बोट चाटवून आपल्या भजनी लावले. एकामागून एकेक म्होरक्या काँग्रेसच्या मठात घुसू लागलेला पाहताच, त्यांच्या बामणेतरी पाठचेल्यांचे लोंढेच्या लोंढे आपले शेमले पटके दूर झुगारून, दीडाण्यांच्या खादी टोप्यांत घुसले. अशा रीतीने म. गांधींनी महाराष्ट्राच्या बामणेतरी पाठकण्याचे मणके ढिले करून आपल्या चळवळीच्या जपमाळेत ओवले. सामाजिक उत्थानाचा ओघ थांबला. काँग्रेसी सभा मिरवणुकात बामणेतरी पुढारी मानसन्मानाचे ढेकर देत बसले. बामणेतरी संघटना कोसळली. ज्या बामणेतरी पुढा-यांना मंत्रिपदाच्या गाडग्यातले लोणी किंवा आमदारकीचा डालडाही चाखायला मिळाला नाही, त्यांनी काँग्रेसविरोधी निरनिराळ्या पक्षांची अंडी उबवून, त्या खुराड्यांचे ते चालकपालक बनून मिरवू लागले. निवडणुका केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी, सत्तेसाठीच लढवल्या जातात. त्यात मतदार जनतेच्या कल्याण अकल्याणाचा प्रश्नच नसतो; याचे एक उदारण सांगण्यासारखे आहे. सन १९३६च्या निवडणुका. ग्वाल्हेरला अर्थमंत्री म्हणून काम करीत असलेले पण पुढे ग्वाल्हेर नरेशाच्या मेहरनजरेला मुकून व्यवसायशून्य बनलेले, देवास नृपतीचे धाकटे भाऊ श्रीमंत खासेराव पवार अचानक पुण्याला येऊन दाखल झाले. देवासकर पवारांची एक छोटीशी गावमिळकत पुणे जिल्ह्यात होती, त्या आधारावर बामणेकर बहुजन समाजाच्या वतीने निवडणूक लढवायला ते सिद्ध झाले. राजकुळातला एक मराठा राजाच आपला पुढारी म्हणून असेंब्लीत जायला धावून आला, याचे पुणे जिल्ह्यातल्या मराठी बहुजनांना पर्वतीएवढे कौतुक वाटले. निवडणुकीत खासेराव प्रचंड मतांनी निवडून आले. मंत्रीपदासाठी वशिला लावण्याच्या खटपटीसाठी नंतर त्यांनी मुंबईला छावणी टाकली. आंग्लायी जमाना होता तो! मंत्र्यांच्या यादीत त्यांचे नाव आले नाहीसे आढळताच सेम्ब्लीच्या पहिल्या बैठकीत शपथविधिसाठीही हजर न राहता ते तडक ग्वाल्हेरला निघून गेले. विश्वासाने मतदान करणारे हजारो मतदार `इचिभन, असं कसं झालंया जी?’ विचारीत एकमेकांच्या तोंडाकडे पाहत बसले. यावरून त्या काळते तथाकथित बामणेतरी बहुजन समाजांचे पुढारी स्वार्थाचे किती जबरदस्त अप्पलपोटे पुजारी बनले होते, हे लक्षात यील.
चाणाक्ष आणि बुद्धिवंत असणा-या बामण वर्गाची अवस्था मात्र त्या वेळेपासून तो या घडीपर्यंत फार विचित्र झाली. जिद्दीने राजकारण खेळण्याचा त्यांचा नूर आरपार बदलला. ना त्यांना गांधीयुगाशी समरस होता आले, ना बहुसंख्य बामणेतर जनतेचा विश्वास सांभाळता आले. अतो भ्रष्टः ततो भ्रष्टाः अशा अवस्थेतच आज तो कट्ट अलिप्ततेचा बुरखा पांघरून स्वस्थ बसला आहे. जिद्दीचा एक पटाईत राजकारणी वर्ग राजकारणी संन्यास घेऊन बाजूला बसावा, हे महाराष्ट्राचे खरोखरच दुर्दैव म्हटले पाहिजे. मागास बहुजन समाजातील ब-याच मंडळीनी स्वातंत्र्योत्तर काळात मंत्रिपदे, आमदारक्या, खासदारक्या पटकावल्या ख-या. पण दोन चार अपवाद वगळता, राजकारणातली प्रतिष्ठा इभ्रत आणि सत्तेचा दर्जा जरूर तितका त्यांना सांभाळता आलेला नाही. येथेही त्यांची जातीय भावना, वैयक्तिक स्वार्थ आणि बामणांनी शिकविलेल्या वर्चस्वाच्या अहमहमिकेच्या जोरावरच चालू आहे. काँग्रेसी किंवा बामणेतरी चालू पुण्याईचे फळ म्हणून जी आलतुफालतू मंडळी लोकसभेत जाऊन बसली, त्यांनी लोकहितवादाच्या प्रश्नावर एकदाही तोंड उघडल्याचे दाखले नाहीत. त्यांच्या उमेदवारीवर प्रसन्नतेच्या गंधाक्षता उधळणा-या पक्षधेंडांनी त्यांच्या शिक्षणाचा, राजकारणी अभ्यासाचा किंवा दरबारी पांडित्याचा विचारच केला नाही.
जाहीर सभांतून अललडुर्रची रावणी भाषणे करणार आणि प्रतिस्पर्ध्याची हुर्ररेवडी उडविणारे केवळ बोलभांड लोकच लोकसभेत गेले. `जोवरी नाही देखले पंचानना, तोवरी जंबूक करी गर्जना’ अशा त्यांची अवस्था दिल्ली दरबारात उडाली नसती, तरच ते एक मोठे आश्चर्य झाले असते. परिणाम काय झाला? महाराष्ट्राची बाजू पांडित्याने हिरिरीने आणि जिद्दीने मांडणारा सी. डी.देशमुखांशिवाय दिल्ली दरबारात एकही म-हाठा आदमी आजवर तरी दिसला नाही. मंत्र्यांपासून खासदारापर्यंत सगळेच दिल्लीपुढे बिल्लीसारखे वागत गेल्यामुळे, केंद्र सरकारात आज महाराष्ट्र म्हणजे किस चिडयाका नाम होऊन बसला आहे. आधीच म-हाटशाही काळापासून उत्तर हिंदुस्थानी लोक महाराष्ट्राचे कट्टे द्वेष्टे, तशात `उभ्या भारतात महाराष्ट्र हाच एक नासका सडका भाग आहे आणि तो कधी ना कधी छाटूनच काढला पाहिजे’ हा तर ननेहरू घराण्यातला मोतीलाल नेहरूचा वेदवाक्यासमान आदेश! शिवशाहीतील म-हाठ्यांच्या कर्नाटकी स्वा-या आणि राजकारणी वर्चस्वामुळे, दाक्षिणात्यांचा महाराष्ट्राशी उभा दावा. `बोंगलेरखोबर बोलचेर’ वाल्यांनाही अजून `मराठा डिच्च’ची आठवण विसरता आलेली नाही. रजपूत काय, पंजाबी काय, कोणी कोणी आमच्या बाजूला नाही. महाराष्ट्र सर्वस्वी असा एकाकी एकलकोंडा होऊन राहिला आहे. त्याच्या पुनरुत्थानाच्या लढाया नि खटपटी त्याच्या त्यालाच लढायच्या आहेत. आमच्या समाजकारणी, राजकारणी, अर्थकारणी, कसल्याच कारणाच्या किल्ल्या ना दिल्लीच्या हातात, ना इतर कोणाच्याही हातात.
आम्हीच आमचे मित्र नि शत्रू हे कटाक्षाने आजच आम्ही जिव्हाळ्याने जाणले नाही, तर थोड्याच काळाने म-हाठे नि महाराष्ट्र भारताच्या नकाशावरून सफाचाट निपटून नष्ट होतील. कोणताही राजकीय पक्ष त्याची बाजी राखायला धावणार नाही. ही काळाची खणखणीत हाक आहे.
लेख ५
महाराष्ट्र राज्याचे पाणी जोखले
महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य आहे, असे बोलले जाते. प्रश्न एवढाच की त्या राज्यात ` महाराष्ट्र’ आहे काय? मराठी भाषिक म-हाठा माणूस आज या राज्यात स्वाभिमानाने जगू शकत आहे काय? भूतकाळ बाजूला ठेवा, उज्ज्वल भविष्याकडे आत्मविश्वासाने जाण्यितपत तरी त्याचे वर्तमान जिणे आशादायक झालेले किंवा होत आहे काय? महाराष्ट्र राज्य जर मराठी भाषिक म-हाठ्याच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी जन्माला आलेले असेल, तर यच्चयावत क्षेत्रांत उप-या परप्रांतियांनी त्याच्यावर केलेली घोरपडी चिकाटीची चढाई आमूलाग्र उखडून टाकण्यासाठी महाराष्ट्राचे मराठी मंत्री प्रयत्नाचे कितीसे डोंगर पालथे घालीत आहेत? आत्मोद्धारालाही वाव नसलेल्या राज्याविषयी कोण अभागी राज्यनिष्ठेचे फाजील प्रदर्शन करील? जिकडे नजर टाकावी तिकडे निराशा नि असंतोष! संतोषातूनच क्रांती होत असते आणि असल्या परिस्थितीला जबाबदार असणारांची तीत होळी होते.
लोकशाही, समाजवाद, साम्यवाद (कम्युनिझम), निधर्मी राज्य इत्यादी नि वगैरे घोषणांची बरसात करून, लोकांना झुलविण्याचा काँग्रेसादि पक्षांच्या ज्या झटापटी नि धडपडी आपल्याभोवती गांधीलमासांसारख्या अखंड घोंगावत असतात, त्या वास्तविक चालल्या आहेत कशासाठी? काँग्रेस पक्षाची धडपड, अचानक हाती आलेल्या सार्वभौम सत्तेच्या आचद्रार्कं टिकावासाठी आणि बाकीच्या इतर पक्षांच्या खटपटी लटपटी चालल्या आहेत, हव्या त्या भल्याबु-या युक्त्या, जुक्त्या, इतकेच काय पण कारस्थाने, संप, मोर्चे जाळपोळीने राज्ययंत्र खिळखिळे करून पदच्युत काँग्रेसच्या हातची सार्वभौम सत्ता पटकाविण्यासाठी.
`आमचा पक्ष दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाला रे झाला की पाहा, हां हां म्हणता या भारतात आसेतू हिमाचल दुधा-मधाचे लोंढेच्या लोंढे वाहू लागतील. दारिद्र्याची नावनिशाणी राहणार नाही, गरीब श्रीमंत हा भेदच उरणार नाही.’ अशा ज्या गुळचट थापा काँग्रेससकट सारे पक्ष देत असतात, त्यांच्या पोटात सत्तेच्या वखवखीशिवाय आणखी काहीही नसते, हे लोकांनी आता स्पष्ट ओळखले पाहिजे.
`आडल्ट फ्रान्चाईज’ म्हणजे वयात आलेल्या हरएक स्त्री पुरुषाला `मतदानाचा हक्क’ भारतीय घटनेत घालण्यात आले, तेव्हा `आहाहा, काय हो हो काँग्रेसवाले केवढ्या उदार मनाचे महात्मे’ असा लोकांनी जयघोष केला. कबुतरांच्या पटांगणावर धान्याची शिपतरे भसाभस ओतावी, कावळे, पारवे, चिमण्या, घारी असा कसलाही भेद राखू नये, इतक्या मुक्त हस्तांनी त्यांनी मतदानाच्या हक्काचा दानधर्म केला, म्णून अनेक बावळटांनी काँग्रेसपक्षाला आरत्या ओवाळल्या. पण या दानधर्मातच काँग्रेस पक्षाने आपल्या सत्ता-टिकावाचे जबरदस्त मर्म साधून घेतले, हे कोणाच्या त्या वेळी फारसे लक्षात आले नाही. आधीच भारतात शिक्षणाचा प्रसार फार कमी, केवळ साक्षरता म्हणजे सारासार विचार करण्याची लायकी ठरत नाही. द. भारतात (म्हणजे गोदावरीच्या खाली) शिकलेल्यांचा नि ब-यावाईट विचार करणारांचा थोडासा भरणा असला, तरी उत्तरेकडील बहुजन समाज आजही `मुकी बिचारी कुणी हाका’ अशा अवस्थेतच आहे. निवडणुकांच्या हंगामात गांधी नेहरूंच्या नावाच्या जयजयकारात हाकारा देऊन जंगलातली पाखरे किंवा गोठ्यातली गुरेढोरे जशी उठविली जातात, तशा वयात आलेल्या स्त्री पुरुषांच्या टोळ्यांच्या टोळ्या मतदान केंद्रावर हाकून नेण्याची आणि ठरलेल्या निशाणांवर खुणा करवून घेण्याच्या पद्धतीने फार फायद्याची सोय झालेली आहे. आपण कोणाला मत देतो, का देतो, याचा विचार करतो कोण? आणि विचार करण्याइतकी अक्कल असतेच कोणाला? सगला मेंढरांचा बाजार! विचावंत फार थोडे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला काय, अडाणी अशिक्षित आणि श्रद्धाळू जनतेच्या तांड्याकडून, पक्षीय मतदानाची झोळी हुकमेहुकूम भरून घेता येते. शिवाय मतदानासाठी जोरजबरदस्तीच्या बरोबरच रोख दक्षणांची पडदानशीन खैरात होते ती न्यारीच. भारतीय भ्रष्टाचाराचा श्रीगणेशा प्रथम निवडणुकांच्या इस्लेट पाटीवर असा काढला जातो. या पापात काँग्रेसादि यच्चयावत सगळ्या पक्षांचे हात बरबटलेले असात. तरी `आम्ही जणू काय त्या गावचेच नव्हत.’ हा शहाजोग बहाणा कताना, लाज शरमेची आणि पक्षनेत्यांची गाठ मात्र केव्हाच पडत नाही. हा चालू लोकशाही जमान्याचा महिमा किती वर्णावा? समाजवाद का काय म्हणतात ते फिसाट, भारतात येईल तेव्हा येवो, सध्या मात्र सर्वत्र पक्षीय माजवाद बोकाळला हे, एवढे मात्र खरे.
याच संदर्भात बृहन्मुंबईतील झोपडपट्टीतील लक्षावधी मंद्राध्रीय केरळादि उपरे म्हणजे अनेक पक्षांचे आणि तद्देशीय नि तज्जातीय प्रतिष्ठित म्होरक्यांचे हुकमी मतदानाचे जबरदस्त भांडार होऊ घातले आहे. झोपडपट्टीतील हजारो स्त्रीपुरुषांची नावे मतदारांच्या याद्यात घुसडण्याचा राजरोस धंदा सध्या चाललेला आहे. अचानक येथे उपटलेल्या नि प्रतिष्ठेच्या शेंदराने धन्य झालेल्या उप-यांच्या म्होरक्यांना मुंबईच्या म-हाठ्यांनी जरी मते दिली नाहीत, तरी झोपडपट्ट्यातील हातभट्टीवाले स्मगल्ड मालाचे व्यापारी तडीपार होऊन येथे घुसलेले आणि मन मानेल ते समाज विध्वंसक धंदा करणारे, यांच्या भरघोस मतांच्या जोरावर ते हमखास निवडून आलेच पाहिजेत, असल्या खटपटी नि लटपटी जोरात चालू हेत. सारी मुंबईच झोपडपट्टीवाल्यांनी काबीज केली केल्यावर विचारतो कोण मुंबईकर म-हाठ्यांना नि इतर पिढ्यान् पिढ्या स्थायिकांना? उगाच का सोशालिस्ट कम्युनिस्टादी पक्ष ऊठसूट झोपडीपट्टीवाल्यांचा एवढा कैवार घेतात?
येथवरच्या विवेचनावरून, महाराष्ट्राच्या पुनरुत्थानाचा आणि म-हाठी भगिनी बांधवांच्या एकजूट संघटनेचा प्रश्न पूर्वीपेक्षा आज किती कठीण झालेला आहे, याची वाचकांना कल्पना होईल. महाराष्ट्राच्या भाषिक स्वराज्यासाठी शेकडो म-हाठी भगिनी बांधवांचे बलिदान, रक्तदान झाले. उच्च शिक्षणाच्या जोरावर (एका काळच्या) मागास समाजातील मराठी नि तत्सम राज्यात म-हाठ्यांच्या उत्कर्षाचा राजमार्ग मोकळा होईल. अर्ध्या तपाचा काळ गेला, तरीही आम्ही होतो तेथेच आणि होतो त्यापेक्षा अधिक कठोर नि कठीण परिस्थितीच्या जबड्यात तडफडणारे. तर राज्यातल्या मंत्र्यादि कारभार-यांच्या भाषिक जनतेच्या आपुलकीच्या तडफेपुढे, आमचे म-हाठी मंत्री नि कारभारी शुद्ध गयावळाचे अवतार! तोंडात घातलेला घास गिळू का टाकू, याच्याही आज्ञा त्यांना काँग्रेसी हाय कमांडकडून घ्याव्या लागतात. इतर राज्यातले मंत्री परभाषिक परकीयांची स्वभाषिक राज्यात होणारी आक्रमणे जेव्हाच्या तेव्हा जागच्या जागी ठेचून काढतात. राष्ट्रवादाचा मुलाहिजा त्यांना केव्हाच नसतो. आमच्या मंत्र्यांना सदा न् कदा राष्ट्रवादाचे हिंवडे भरते. `काँग्रेसी केंद्राकडून हिंदी भाषेत येणारे हुकूम नि फर्माने बेलाशक जाळून टाका’ `म्हैसुरातून बेळगाव काढण्यासाठी पाक-चीन आक्रमणासाठी वापरलेल्या सैन्यापेक्षा दसपट सैन्य आणावे लागेल.’ असली बेगुमान धमकीची भाष्ये दाक्षिणात्य राज्ये करतात, तेव्हा त्याचे कान उपटायची केंद्रालाही छाती होत नाही आणि आमच्या म-हाठी मंत्र्यांना, आपण अमुक बोललो किंवा केले, तर दिल्लीवाले काय म्हणतील? याचा रात्रंदिवस आचका दचका! परप्रांतातून मुंबईत भाक मागायला आलेले लक्षावधी भिकारी त्या त्या प्रांतात परत पाठवावे, असा `बेगर्स अक्ट’मध्ये स्पष्ट आदेश आहे, त्याप्रमाणे तात्काळ तसे न करता, आमच्या सरकाराने त्या त्या राज्यांना खलिते पाठवून `आम्ही से करीत आहो, आपण त्यांची तिकडे सोय लावावी’ अशी विनवणी केली. आजकालच्य जगात विनवण्यांना कोण धूप घालतो? विनवण्या नेभळट करतात. मर्दाचा सपाटा नि तडाखा न्याराच असतो. संबंधित सगळ्या राज्यांनी `खबरदार, ते भिकारी आमच्याकडे पाठवाल तर’ असा सज्जड दम भरला आणि आमचे महाराष्ट्र सरकार बसले निमूट होत चोळीत. याचे कारण केंद्रासकट भारतीय सर्व राज्यांनी महाराष्ट्र राज्याचे पाणी जोखले आहे. `दिल्लीवाल्या केंद्रियांना महाराष्ट्राचा आकस आहे’ असे उद्गार संयुक्त महाराष्ट्र च्या आंदोलन प्रसंगी सर चिंतामणराव देशमुख यांनी काढले. वास्तविक कोण कोणाचा आकस धरतो? समोरचा तसाच नि तितकाच जबरदस्त, बलवंत असेल तरच, एरव्ही गलथान नि गयावळांचा आकस धरण्याइतके महामूर्ख अजून जन्माला यायचे आहेत.
तसे पाहिले तर महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ केवळ जातीने मराठी किंवा तत्सम आहे, इतकेच नव्हे तर ते जातिवंत म-हाठी आहे. महाराष्ट्राचा त्यांचा अभिमान ज्वलंत आहे. मायदेसाच्या उत्कर्षाविषयी त्यांच्या भावना जागरूक आहेत. इतके सारे असूनही दिल्लीचा धाक त्यांना कमजोर का करतो? याचे कारण, इतर राज्यांतल्या मंत्रिमंडळापेक्षा म-हाटी मंत्रिमंडळ पक्षीयतेच्या नि राष्ट्रवादाच्या न्युमोनियाने फाजील पछाडलेले आहे. एक वेळ जातीयता पत्करली पण पक्षीयतेच्या दण्डुक्यापुढे शहाणे सुरते स्वत्वाला नि स्वाभिमानाला कसे पारखे होतात, हेच येथे दिसून येते. सत्तेच्या खुर्च्या टिकवायच्या तर काँग्रेसी पक्ष सोडता येत नाही. पक्ष सुटला का मग कोण विचारतो यांना? पण काँग्रेसी हायकमाण्डपुढे वाकताना कमरेची अगदी `अक्यूट अँगल’ करण्याचे कारण काय? काय, आमच्या मंत्रिमंडळाला म-हाठी जनतेचा, विधान-राज्य सभेचा भरघोस पाठिंबा नाही? दाखलाच द्यायचा तर सीमा- प्रश्नच घ्या ना. बेलगाव-निपाणी-कारवार-बिदर हे मराठी जिल्हे महाराष्ट्र राज्यात आलेच पाहिजेत, असा ठराव विधानसभेने एकमताने मंजूर केला ना? मग हायकमांडपुढे हाय खाऊन एक सदस्य निर्णय – समितीच्या मायावी घोरपडीला मान्यता देण्याचे कारण काय? `आमच्या राज्याच्या विधानसभेने मंजूर केलेल्या ठरावाचा आदर हायकमांडवाले राखीत नसतील, तर `घ्या आमच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा,’ असे ठणकावण्याइतकाही म-हाठबाणा म-हाठी मंत्रिमंडळाला दाखवता येऊ नये?’ तिकडे ते महिषासूर मन मानेल त्या धमक्या केंद्राला नि हायकमांडवाल्यांना बेछूट देतात आणि आम्ही? दिधले दुःख पराने, उसने फेडू नयेचि सोसावे, हा गेल्या शतकातली शालेय पुस्तकातली आर्याच अजून घोकीत आहोत. एवढ्यावरच थांबले नाही. म-हाठी मंत्र्यांत तरी एकदिलीचा एकोपा कुठे आहे? त्यांच्यातही गटबाजी आहेच. सातार गट, कोल्हापूर गट, यवतमाळ गट, नागपूर विदर्भ गट, नगरगट, जिल्ह्याजिल्ह्यांचे गट! निवडणुका जवळ आल्या का या खेपेला मुख्यमंत्रीपद कोणाचे? गृहखाते कोणाकडे? याचे वादविवाद चालू होतात आणि त्या धोरणाने? थेट दिल्लीपर्यंतच्या वगवशिल्यासाठी भीमथडी, गंगथडी तट्टांची दौड चालू होते. तट्टांच्या जिनावर जात-पोटजातीच्या अहमहमिकेचेही शिडकाव उडालेले असतात. सत्तेची मांड टिकविण्यासाठी म-हाठी मंत्र्यांत किती परस्पर चुरस चाललेली असते, याच सत्ताधारी बिनचूक अंदाज बांधूनच महाराष्ट्राला नेहमी तुंकराने वागायला सवकलेले आहेत. इतर राज्याला तसे वागवण्याची केंद्राला हिम्मत होत नाही. कारण ते केंद्राला ठिकच्या ठिकाणी तडकावून मोकळे होतात.
लेख ६
मऱ्हाठों शैतानकी औलाद है!
जुन्या जमान्यात, अगदीलो. टिळकांच्या अवसानापर्यंत म-हाठा म्हटला की त्याचा एक दांडगा वचक सगळीकडे होता. भारताच्या राजकारण क्षेत्रात तर महाराष्ट्राचा होकार मिळाल्याशिवाय एकाही प्रांताला वा इलाख्याला पाऊल उचलावेसे वाटत नसे. आंग्लाई गुलामगिरीत देश असतानाचे हे सारे दृश्य. आता तर देश स्वतंत्र झाला आहे. भाषिक राज्ये चालू आहेत. शिक्षणादी सर्व क्षेत्रांत मागासलेला आणि राजकारणातील बामणांची मक्तेदारी झुगारून द्यायला फुरफुरणारा मागासवर्ग शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात धडाडीची आघाडी मारून, चालू लोकशाही युगात, म-हाठी राज्याचा कर्णधार झाला. मग तो अखिल भारतीय आचक्या टचक्या म-हाठबाण्याचा पीळ आताच असा एकाकी ढिला का पडला? मोठा विचार करण्यासारखा चिंतेचा प्रश्न नव्हे का? `महाराष्ट्र म्हणजे भारताचे हृदय’ अशी कव्युती वरचेवर स्वतःच्या मनाचे समाधान करून घेणारांना माझा सरळ सवाल हे. आता ती हृदयाची घमेंड तर राहून द्याच, भारतीय राजकारणाच्या उंबरठ्याबाहेर महाराष्ट्राला त्याचे जोडेजुते ठेवण्याइतकाही मगदूर उरलेला नाही. हे स्थित्यंतर अतिशय शोचनीय आहे. याला जबाबदार कोण? म-हाठी राज्याच्या सत्तेवर असणारांनी या सवालाचा जाब दिला पाहिजे. कस्सून आत्मनिरीक्षण केले पाहिजे. पण ते ते करणार नाहीत. करण्याइतका देशाभिमान त्यांच्यात शिल्लक असावा असे दिसत नाही. त्यांचा आचारविचाराचा सारा ओढा `आपली सत्ता कशी टिकेल?’ यावर खिळलेला दिसतो. लोकांच्या उद्धारापेक्षा आत्मोद्धारासाठीच त्यांच्या सगळ्या खटपटी चाललेल्या असतात. जिंकण्याकडे आणि हातात आलेली सत्ता टिकविण्याकडेच त्यांच्या धोरणाचे लक्ष्य वेधलेले असते. लोकांच्या जगण्या मरण्याच्या विवंचनेपेक्षा त्यांना पक्षीयतेची मुर्वत जबरदस्त. जाति-धर्मात ज्याचा तो मुख्त्यार न्यायाने जातीयता पत्करली, पण स्वार्थाचा कॅन्सर साखा कुलता ठेवणारी पक्षीयता फार भयंकर. पक्षीयतेच्या वातावरणात स्वतंत्र आचारविचारांना वाव असणारच कोठून? थोडक्यात सारांश काढायचा तर प्रत्येक पक्ष म्हणजे बडा गुलामखाना आणि त्याच्या जाळ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या मनाचे नि मतांचे दिवाळे वाजलेले! काँग्रेसपक्षीय गुलामखान्याचे जेलर कामराज का यमराज म्हणतात ते, ते आहेत. दाक्षिणात्य मद्र, आंध्र, म्हैसूर नि केरळादिकांचे म्होरक्ये. दाक्षिणात्य उप-यांनी गेल्या अर्धशतकात सारा महाराष्ट्र पोखरून त्याचा भुस्सा पाडला आहे. तिकडे सारा दिल्लीदरबार या यमराजाच्या दाबणीखाली जाम दडपलेला. सीमातंट्यामुळे म्हैसूर आणि महाराष्ट्र यांची वादावादी आणि झोंबाझोंबी गेली दहा वर्षे अखंड चाललेली आहे. यमराजाच्या वरहस्तामुळे म्हैसूरवाले फार चेकाळले, चवताळले आहेत. म्हणूनच महिषासुरी मंत्री महाराष्ट्राला नि म-हाठ्यांना बदनाम करणा-या खाडकाळ्या शिव्या देताना जनामनाची लाज न बाळगण्याइतके बेफाम भडकलेले आहेत. अशा अवस्थेत जोवर दाक्षिणात्य काँग्रेसझार यमराज काँग्रेसी हायकमांडचा कमांडर हे तोवर, धरले तर चावते सोडले तर पळते, अशा कुचंबणेत महाराष्ट्र नि मऱ्हाठे मंत्री सापडलेले दिसतात.
काँग्रेसी पक्षीयतेच्या मानसिक गुलामगिरीत आमचे मंत्रिमंडळ अडकलेले असले, तरी जनता काही आरपार काँग्रेसमय झालेली नाही. पण तिची अवस्था इकडे असे, पोर पिसे, जावई मिळाले, तेही तसे अशी झालेली. आपल्या आधीव्याधींच्या, अडीअडचणींच्या, जुलमांच्या, अत्याचारांच्या फिर्यादी न्यायच्या कोणत्या दरबारात, हेच लोकांना उमजेनासे झाले, खालपासून वरपर्यंत लाचलुचपतीची वाळवी सारखी बिनअटकाव जीवनाची पोखरणी करीत असतानाच जोरावर दाक्षिणात्य उप-यांनी पोटापाण्याचे, नोकरीधंद्याचे, अन्नवस्त्र, आस-याचे सारे रस्ते अडवलेले. सरकारच्या हौसिंग बोर्डाने बांधलेल्या इमारतींचे सारे गाळे उप-यांनी बळकावलेले. शेजारी गाळ्यात राहणा-या मऱ्हाठी भाडेकरूंवर त्यांची नित्य चाललेली गुंडगिरीची आक्रमणे.
प्रत्येक वसाहतीत उपऱ्या दादांच्या दहसतीखाली चालणारे अनेकमुखी अनैतिक नि बेकायदेशीर धंदे. मुंबईच्या राजकारणात येनकेनप्रकारेण वरिष्ठ हुद्यावर चढलेल्या पऱ्याच्या प्रतिनिधींच्या खास वग वशिल्याने जागोजाग येणा-या नि आलेल्या नगरातील उप-यांची नावे मतदारांच्या याद्यात घुसडण्याचा चाललेला राजरोस धंदा. ही नगरे म्हणजे झोपडपट्ट्या. मुंबईभर रस्तोरस्ती फुटपाथवर उभे राहून स्मगल्ड मालांचा उघड उघड चाललेला उप-यांचा धंदा. किती अवलक्षणे सांगावी? मोकाट सुटलेल्या या दाक्षिणात्य उप-यांनी महाराष्ट्राची नीतिमत्ता पार धुळीला मिळविली आहे. महाराष्ट्रात म-हाठ्यांची नावनिशाणीसुद्धा शिलकी ठेवायची नाही, आणि काही शिल्लक राहिलीत तर आजच्या उप-यांची धुणीभांडी करूनच त्यांनी जगावे, अशा धोरणाने उप-यांचे डावपेच आणि कारस्थाने चाललेली आहेत. आपल्याला तर चटके बसत आहेत, पण उठल्यासुटल्या छत्रपची श्री शिवरायांचा नामघोष करणा-या म-हाठी राज्यकर्त्यांना मात्र उप-यांच्या या चढाईची लांबी रुंदी मापण्याइतका राजकारणी धोरणाचा अंदाज बांधता आलेला नाही. ही घटना दुर्दैवाच्या सदरात कोंबून पुढे जाणे बरे.
म-हाठ्यांच्या अस्तित्वावर आजवर अनेक गंडातरे आली. कमाल हिम्मतबहाद्दरीने ती त्यांनी भिरकावूनही दिली, जातिवंत म-हाठा म्हणजे शेणामेणाचा पुतळा नव्हे, त्याच्यावरही कालपरत्वे एखाद्या मोहाचा पगडा बसू शकतो, किंवा कोणाच्या नि कसल्या तरी मायावी फिसाटाच्या मोहनीच्या तो आहारीही जातो. अर्जुनासरख्या धुरंधर धनुर्धा-यालाही मोहाचा झपाटा टाळता आला नाही, तर तुम्हा आम्हाला नि आपल्या म-हाठी जमातीला तो कसा चुकविता येणार?
कर्तव्य कोणते नि अकर्तव्य कोणते असलाच काहीसा मोह आज आपल्या मनाची मान घट्ट पकडून बसला आहे. आमचा पूर्व इतिहास काहीही असला,तरी आम्ही आज सर्व व्यावहारिक क्षेत्रात कमजोर, कम-क्कल, कम-ताकद झालो आहोत, अशा क्षुद्रतेच्या (इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्सच्या) कल्पनेच्या वावटळीत गरगरतो आहोत. अर्जुनाला हाच मोह पछाडीत होता. सबंध हयातभर कौरवांनी पांडव उच्छेदनाची शेकडो बदकर्मे केली, धृतराष्ट्राच्या भर दरबारात द्रौपदीची अक्षरशः न भूतो न भविष्यती विटंबना केली, तरीही जन्माचे ते वैरी समरांगणात समोर उभे ठाकलेले पाहताच –
न मारू इच्छितो ह्यांस,
मारती जरी मज,
विश्वसाम्राज्य सोडीन,
पृथ्वीचा पाड तो किती? (गीताई)?
असली बडबड करू लागला. बडबडच काय, लेकाने हातातले गाण्डीव धनुष्य खाली टाकले आणि ढसाढसा रडू लागला.
सध्या महाराष्ट्राची अवस्था अशीच झालेली आहे. त्य़ाला विश्वबंधुत्वाची कावीळ झोंबली आहे. `आत्मवत् सर्व भूतेषू’चा डांग्या खोकला झाला आहे. `अहिंसा परमो धर्माः’ची त्याची अपेंडिसायटीस सुजली आहे. राष्ट्रवादाचा कफविकार जोरावर आहे. `भाई भाई’पणाचा पित्तप्रकोप बळावला आहे, डोळ्यात पक्षीयतेचा वडस वाढल्यामुळे, त्याची दृष्टी बिघडली आहे. हातपाय थरथरा कापत आहेत. त्याच्या पुढ्यातल्या ताटातला घास हिरावून नेणारा त्याला आपला जानीदोस्त आहेसा वाटतो. स्वतःपेक्षा त्याच्या ब-यावाईटाची काळजी वाहण्याइतपत तो मतिभ्रष्ट, गतिभ्रष्ट होऊन राहिला आहे. स्वकीय कोण, परके कोण, मित्र कोण, शत्रू कोण, गोंजारतो कोण नि लुबाडतो कोण, याचा विवेकच लुळा पांगळा पडला आहे. आपण होतो कोण, झालो कोण नि पुढे राहणार कसे, याचा विचार करायलाही त्याची बुद्धी बेमान झाली आहे. अर्जुनाला ग्रासलेल्या मोहापेक्षाही हा मोह फार भयंकर आहे. भारतकाळी प्रश्न एका व्यक्तीच्या मोहनिर्मूलनाचा होता, येथे आज सबंध महाराष्ट्र देशाचा सवाल आहे. गीतोपदेश करून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला मोहमुक्त करून युद्धप्रवण केले. राज्यक्रांतीचे एक नवीन युग उगवले. तसल्याच आचार विचार क्रांतीची महाराष्ट्राला आज भूक लागली आहे. पण महाराष्ट्राचा श्रीकृष्ण भगवान कोण? त्याच्यावर चाल करून येणारी संकटे नि आक्रमणे, हाच त्याचा भगवान. मग ती कसलीही, कोणाचीही नि कितीही भयंकर असोत. अंतःकरणाला त्यांचा कचकचीत चिमटा बसला, रक्ताचे पाघळ ओहोळेपर्यंत हृदय पिळवटले गेले, डोळ्यासमोर होत असलेल्या अनाचार, अत्याचारांनी त्याच्या स्वाभिमानाला एकलहरी सापाचा डंक मारला, म्हणजे म-हाठा असा काही चवताळून उठतो का मग त्याची डुक्करमुंडी थोपविण्याची कळिकाळाला शहामत नसते.
महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास म्हणतात तो हाच. म-हाठा मेलेल्या आईचे दूध प्यालेला नव्हे. अर्जुनाप्रमाणे अनेकवेळा तो कर्तव्यच्युतीच्या मोहजालात अडकला. पण एकदा का त्याच्या बापजाद्यांच्या पराक्रमाचा इतिहास समोर उभा ठाकला आणि त्याने `ग्येली लाज तुम्ची का रं थूत् तुम्च्या जिनगानीवर’ अशी स्वच्छ मराठमोळी शिवी हासडली, का मृहाठा तडाड खडा होऊन प्रतिस्पर्ध्याच्या नरड्याला हात घालतो. इतिहासाचा दाखलाच घ्या ना.
सतत दहा वर्षे औरंगजेबाच्या ठिकठिकाणच्या आक्रमणाला टोल्याला टोला नि डोळ्याला डोळा देत ब-हाणपूर ते गोव्यापर्यंत सारी दख्खन तुडवणारा छत्रपती शंभूराजा, संगमेश्वरला गफलतीने हस्तगत करून बादशहाने अत्यंत राक्षसी क्रूरपणाने त्याची हत्या केली. राणी येसूबाई नि युवराज शाहू यांना पकडून मोगली छावणीत गिरफदार केले. राजधानी रायगडाची लुटालूट नि जाळपोळ केली. दुसरा युवराज राजाराम परांगदा झाला. श्री शिवरायाने रक्ताचे पाणी नि हाडाची काडे करून महान पराक्रमाने उभारलेले हिंदवी स्वराज्यच जणू काय हां हां म्हणता रसातळाला गेले. म-हाठ्यांच्या राज्यवैभवाची साक्ष देत रायगडच्या नगारखान्यावर डौलाने फडफडणारा भगवा झेंडा मोगलांनी पायदळी तुडवला. मग हो काय? यच्चयावत म-हाठी जनतेच्या खोल जिव्हारी हा घाव लागला. छत्रपतीच्या अमानुष हत्येने त्यांची माथी भडकली. सूड घेण्यासाठी त्यांच्या मुठी तडतडू लागल्या आणि म्यानातून तलवारी बाहेर पडल्या. आपला सरदार कोण, नेता कोण कशाकशाची लोकांनी पर्वा केली नाही. बाप्ये उठले. बाया उठल्या. ठिकठिकाणी जमावांचे थवेच्या थवे मोगल दिसतील आढळतील तेथे तडाखेबंद फन्ना उडवीत चालले. गावागावात मराठी बायका शेताच्या माचावर चढून, मोगलांची टोळी दिसली रे दिसली का बेफाम गोफणगुंड्यांच्या मारा करून त्यांना पळता भुई थोडी करू लागल्या, छत्रपती ठार मारून रायदड जिंकला, मराठ्यांचे राज्य खतम केले, अश खुषीत गाजरे खाणा-या बादशहाभोवती म-हाठी गांधीलमाश्यांचे पिसाळलेले मोहोळ घोंगावत सा-या छावणीभर डंखावर डंख मारू लागले. म-हाठी मर्दानी खुद्द बादशहाच्या खास तंबूवरचे चार सोन्याचे कळस कापून आणले. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या सेनापतींनी रायगडापासून तो थेट कर्नाटकातील जिंजीच्या पायथ्यापर्यंत बादशाही सैन्याचा धुव्वा उडविला. गावोगावच्या पिसाळलेल्या जनतेने बादशाही रसदेचे काफिले जागोजाग मारून मोंगली सैन्याची भरमसाट उपासमार केली. तेव्हा कुठे बादशहाला साक्षात्कार झाला की आपण समजत होतो तसे म-हाठे हवा तो अवमान जुलूमजबरदस्ती मेंग्याप्रमाणे मुकाटतोंडी सहन करून, दैवाला दोष देत बसणारे गलथान हैवान नसून `म-हाठों शैतानकी अवलाद है.’ राज्यक्रांतीच्या या काळात म-हाठी मुत्सद्यांनी, कारकुनांनी, सरदारांनी, बारगिरांनी आणि बालवृद्ध लोकांनी त्यागाची, शौर्याची, डावपेचांची आणि आत्माहुतीची कमाल शीग गाठली, म्हणूनच रायगडावर कोसळलेले हिंदवी स्वराज्य पुनश्च दुप्पट चौपट दरा-याने नि वैभवाने साता-याला झळकू लागले.
लेख ७
महाराष्ट्राचा वाली कुणी नाही
कल्पनेलाही पांगळी करणारा हा अपूर्वच चमत्कार कशाने घडला? महाराष्ट्रातील अठरापगड जमातींच्या वज्रमुष्ठी एकोप्याने, जमातवादही एक जबरदस्त शक्ती आहे. महाराष्ट्रातल्या यच्चयावत राजकीय, सामाजिक, धार्मिक उलथापलथी जमातवादानेच घडविलेल्या आहेत. आमची जात कोणतीही असो, महाराष्ट्र मायभूमीच्या इतिहासख्यात म-हाठबाणा चिरकाल ज्वलंत राखण्यासाठी, जमातवाद हा एकच तरणोपाय आहे. चालू जमान्यातील म-हाठ्यांशिवाय भारतातील इतर राज्यांतील लोक जमातवादाच्या जोरावरच महाराष्ट्रात आणि ठिकठिकाणी आपापले पाय जाम रोखून ठाम वसती करून राहिलेले आहेत. मद्राशी, आंध्रीय, केरळीय, उत्तर भारतीय लोकांनी महाराष्ट्रात घुसून मराठ्यांनाच त्यांच्या घरातून हुसकून परे बनवले ते जमातवादाच्याच जोरावर. येथे कसला आलाय डोंबलाचा राष्ट्रवाद! राष्ट्रवाद सेक्युलरीझम, विश्वबंधुत्व, ही सारी निवडणुका लढवून सत्ताबाजीसाठी जीव टाकणा-या पक्षीय लफंग्यांची थोतांडे आहेत. राष्ट्रवादाच्या ऐसपैस बुरख्याखाली सगळ्यांनी जमातवादाची शिकस्त करूनच महाराष्ट्राला दिवसाढवळ्या खुशाल लुटावे आणि मराठ्यांनी मात्र राष्ट्रवादाच्या कट्टर आचरणासाठी जमातवादाला तिलांजली देण्याचा बेलभंडारा उचलावा, या हट्टाच्या पोटातले काळे कारस्थान म-हाठ्यांनी आता नीट पारखले पाहिजे. महाराष्ट्राभिमानाच्या लंब्याचौड्या भाषणबाजीच्या भांडवलावर, दिल्ली दरबारात वर्णी लागलेले म-हाठी नेतेसुद्धा आता मायभूमीच्या हिताहिताचे मामले राष्ट्रवादाच्या जाडजूड दंडुक्याने टोलवू लागला आहेत.
महाराष्ट्रात जागोजाग मोठमोठे यांत्रिक कारखाने केंद्रसरकार काढीत आहे. कित्येक चालूही झाले आहेत. मोठमोठ्या धरणांच्या योजना आखण्यात आल्या नि येताहेत, त्यासाठी हजारो शेतक-यांच्या सुपीक जमिनी कब्ज्यात घेणे प्राप्त. जमिनीच्या बदला त्यांना देण्यात येणा-या आकर्षक, मोहक नि लोभस सवलतींची निकल प्लेटी आश्वासने द्यायला, सरसावणारे कोण? केंद्राच्या वतीने आमचेच म-हाठी पुढारी नि मंत्री! तुर्काला बनवायला तुर्क सोडा तसे परस्पर पावणेतेराचे धोरण केंद्राने आखलेले. ठिकठिकाणची जिल्हापत्रे वाचली का आपापल्या जमिनी, कारखाने नि धरणांना देणारे शेतकरी बसले आहेत ठणाणा करीत. आश्वासने देणारे वीर, महावीर बसले दिल्लीत आता कोण कोणाला विचारणार? शेतक-यांच्या जमिनीव उभारलेल्या कारखान्यात नोकरभरती कोणाची? तर महाराष्ट्र नि मुंबई ग्रासून वर शतांगुले उरलेल्या आंध्रीय केरळीयांची! शेतक-यांच्या साक्षर पोराबाळांनाही तेथे शिरकावा नाही. नासिकजवळच ओझरचा मिग कारखाना पाहा ना. सारांश, महाराष्ट्राचे राज्य आणि त्याचे कारभारी जातिवंत मराठे असूनही, आज महाराष्ट्राचा वाली कोणी नाही. आमच्यातील पांढ-या गळोटी (व्हाईट कॉलर)च्या अतिशिक्षित पदवीधरादि मंडळीकडे पाहावे, तर ते बुद्धिवादाच्या चिंतन मननाच्या समाधीत. हव्या त्या घटनेवर आस्ति नास्तीची चर्चा चिकित्सा मनमुराद करतील. सभा, संस्था, मंडळे, महामंडळे स्थापन करतील. स्वतः अध्यक्षोपाध्यक्षांच्या जागांवर नावे झळकतील, भाषणे करतील, पण-पण, अखेर काय? काss ही ना ss ही! हातपाय हालवतील तर हराम. जमातीच्या उत्थानाचा साधा सामाजिक प्रश्न आला तरीही हे कायद्याची कलमे धुंडाळतील. घटना चघळतील. जे काही बोलायचे करायचे, ते सारे कायद्याच्या चौकटीत बसते का नाही, याची शहानिशा करून, मग `हे असे करावे नि तसे करावे’, यांचे परोपदेशे पांडित्य करतील. स्वतः मात्र जागचे हालायचे नाहीत. राजकारणाची चर्चा रगड करतील, पण राजकारणी आंदोलनात भाग घ्यायचे नाहीत. आणि जे कोणी घेतील, त्यांचे `अमुकच चुकले ते तसे करायला नको होत,’ इत्यादी नि वगैरे आक्षेप घ्यायला मात्र चुकायचे नाहीत. या बुद्धिवान पांढ-या गळोटीवाल्या वर्गाला महाराष्ट्रावर झालेल्या नि रोज होत असलेल्य परप्रांतीय उप-यांच्य सार्वक्षेत्रीय आक्रमणाबद्दल चाडचीड काहीच वाटत नाही, असे मुळीच नाही. अधूनमधून फुरसत सापडले तशी मराठी वर्तमानपत्रात पत्रे छापायला पाठवतील. ती कधी प्रसिद्ध होतात, तर पुष्कळ वेळा संपादकीय केराच्या टोपलीत जातात. टाइम्ससारख्या इंग्रजी दैनिकात तर असल्या विषयांच्या पत्रांना थाराच नसतो म्हणा.
हित्यिक कवजिन नाटककार याच वर्गांचा एक भाग आहे. देशाच्या साहित्याच्या आणि कविता कोट्यांच्या रंगढंगावरून, त्यांच्या तत्कालीन मानसिक, बौद्धिक संस्कारांची आजमावणी करण्याचा प्रघात आहे. सामाजिक, धार्मिक, नैतिक आरोग्य तपासण्याचे हेच थर्मामीटर म्हटले तरी चालेल. साहित्याची सेवा करायला निघालेली शंभरावर मराठी मासिके आहेत. कवितांच्या क्षेत्रातही भावगीते, गावगीते, वात्रटिका, चावटिका किंचित् कविता, इत्यादिकांचे पीक महामूर पिकत असते. नाटकांच्य प्रसूति-वेगाला तर धरबंधच नाही. साहित्याचा, कवितांचा नि नाटकांचा आजचा सारा पसारा पाहिला तर महाराष्ट्राच्या सामाजिक जिण्याची अवस्था आज कशी आहे, याची स्पष्ट कल्पना व्हायला काही हरकत नसावी. जो कलमबहाद्दर-लेखक वा कवि-उठला `तो आणि ती’ भोवतीच पिंगा घालणारा. विरहिणीच्या हृदयाची स्पंदने चितारण्यात कविजन आपल्या स्फूर्तीचा मुरंबा चोपडून प्रतिभेची पोळी चाटतील, पण मायदेशाच्या भवितव्याला डसलेल्या इंगळ्यांची त्यांना विवंचना वा वेदना स्पर्शही करायची नाही. होतो कोण, आहोत कोण, होणार कोण, सगळ्यांचा जिव्हाळा आषूक माषूकांभोवती. रेडियोत नित्य होणारी नाटके पाहा. रडारडीशिवाय एक तरी नाटक कधी कोणी ऐकले आहे काय? कित्येक वेळा तर मरतिकीसारखा रडाओरडा घराघरातील शांततेचे नि मनःस्थितीचे वातावरण इतके भयनाक बिघडवून टाकते की झक मारली नि आपण रेडियो लावला, असे तरी वाटते एक, किंवा आता जाऊन त्य नाटककाराचे आणि ते रेडियोवर लावणाराचे तोंड नालबंद पायतणाने झोडपून काढावे, असे वाटते.
आषूक माषूकाच्या खाते-यात लोळणारा आणि स्वतः रडून अवघ्या म-हाठ्यांना सदान् कदा रडायला लावणारा, हेच का आजच्या महाराष्ट्राचे चित्र? हेच का त्याचे सामाजिक आरोग्य? हीच का त्याच्या नीतीची लांबीरुंदी? संस्कृती का काय म्हणतात ती आणि अस्मिता का भस्मिता म्हणतात, ती हीच काय?
असे असेल तर थूत आमच्या जिनगानीवर! राष्ट्राची चवथी इस्टेट म्हणून वृत्तपत्रांचा गौरव करण्यात येत असतो. लोकमताला आरोग्यदायी वळण देणे, लोकांच्या अडीअडचणींना चव्हाट्यावर मांडून, त्यांच्या निरसनासाठी संबंधित व्यक्ति वा संस्था अथवा सरकार दरबारच्या न्यायबुद्धीला आवाहन करणे, अथवा आव्हान देणे, इत्यादी कर्तव्ये वृत्तपत्रांना पार पाडायची असतात. संपादक महाशय नुसते हुकमेहुकूम खर्डेघाशी करणारे नसावे. त्यांचा स्वाभिमान आणि स्वदेशाभिमान जागताज्योत असला पाहिजे. आज मुंबईत मराठी भाषेत चालणारी ५ दैनिके आणि अनेक साप्ताहिके आहेत. मासिकांची संख्या रगड आहे. एक `नवाकाळ’ दैनिक सोडले, तर बाकीची तीन वृत्तपत्रे भांडवलशाही साखळीची. समपादक आमचेच म-हाठे असले तरी त्यांना आपल्या पोटांकडे नजर देऊन, अन्नदात्या शेटजीच्या भ्रुकुटीचलनाच्या ठेक्यावर लेखनाची हडेलहप्पी करावी लागते. असे करताना त्यांना आपला स्वाभिमान, स्देशाभिमान, सदसद्विवेकबुद्धी, राहत्या खोलीच्या उंबरठ्यावर आत बासनात गुंडाळून मग कामावर जावे लागते. असे न करावे तर दरमहा हजार दीड हजार रुपये पगार कोण लेक देणार यांना? लो. टिळकांनी केसरी पत्र सुरू केले तेव्हा ते बिछान्याच्या वळकुटीवर कागद टेकून लेख लिहीत असत. केसरीच्या व्यापातून त्यांच्या संसाराचे गाडे कसे काय रेटले जात असे माहीत नाही. पण काही वर्षांनी त्यांना तो व्याप नेटाने पुढे चालविण्यासाठी गायकवाड वाडा गहाण टाकावा लागला. टिळकांच्या मानाने भांडवली साखळीच्या वृत्तपत्रात संपादक म्हणून मजुरी करणारे म-हाठी संपादक शंभरपट भाग्यवान होत. पाचवे मराठी दैनिक सांगायला स्वतंत्र, पण झालंय परतंत्र. बाहेर दिमाख पाहावा तर म-हाठबाण्याचा, पण सभोवार घेरा पडलेला कम्युनिष्टी तंत्र-मंत्र-यंत्राचा. या पत्राचा विशेष म्हणजे रोजच्यारोज, एकदाही न चुकता, संपादक महाशयांच्या विश्वोत्तर (केवळ लोकोत्तरच नव्हे) हिलामयसदृश महद्गुणांची व्यक्ती–गीता तारस्वरात गायली जाते. या पत्रात उधळल्या जाणा-या अनेक रंग बेरंग नि बदरंगावरूनही आजच्या महाराष्ट्राचे सामाजिक, मानसिक आणि नैतिक आरोग्य किती सडके कुजके होत आहे, याचा पडताळा निराळा पाहायला नको.
सारांश, सामाजिक उत्थानाच्या बाबतीत पुण्याच्या ज्ञानप्रकाशाने राजकारणात केसरी काळ इत्यादी वृत्तपत्रांनी अगदी पोटतिडकीने जसे आपापले विषय जिद्दीने लढवले, तसे महाराष्ट्राच्या आजच्या अवस्थेच्या निर्मूलनासाठी काया-वाचा-तने-मने-धने झगडणारी वृत्तपत्रे आहेतच कुठे? भांडवलदारी दैनिक साप्ताहिके पत्रे शेठजी मालकांच्या व्यापारी नि राजकारणी धोरणाने चालणारी. काही या ना त्या पक्षाची पाठराखी. पक्षाचे पंख वेळोवेळी जसजसे फडफडतील, तसतशा संपादकांच्या लेखण्या चालायच्या. सगळे पक्ष मानवी प्राण्यांच्या विश्वव्यापी उद्धाराच्या नांगराला जुंपलेले. राष्ट्रवादापुढे त्यांना महाराष्ट्राची पर्वा असणारच कशी? महाराष्ट्रवाद म्हणजे जातीयवाद, संकुचित प्रांतीयवाद! राष्ट्रवादाच्या महासागरात डुंबणा-या पक्षीय देवमाशांनी काय म्हणून महाराष्ट्रवादासारख्या क्षुद्र मासोळीची दखल घ्यावी? आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या वखारी चालवणारांनी महाराष्ट्रासारख्या फुटपाथी दुकानदाराच्या सावलीत येणेसुद्धा त्यांच्या विशाल प्रतिष्ठेला शोभेल काय? चटकन त्यांच्या विश्वबंधुत्वाच्या नाजूक भावनेवर नायटे उमटायचे!
लेख ८
`मराठा तितुका मेळवावा!’
महाराष्ट्राचे आनंदवनभुवन बनविण्यात ज्या समर्थ रामदासांनी आपल्या उभ्या हयातीची तपश्चर्या खर्ची घातली, आणि महाराष्ट्र धर्म म्हणजे महाराष्ट्राच्या उत्थानाचा एक सदैव विजयी धर्म बलवंत करण्यासाठी `मराठा तितुका मेळावा’ ह सोपे साधन सांगितले. लोकांच्या कमनशिबाने राज्यावर `गचाळ राजा’ असला, तर काय अवस्था होते, त्याचे त्यानी केलेले वर्णन पाहा...
हिसेबीं कोण पहातो । धामधूम चहुकडे ।
नीति ते राहिली परतीं । तेथे कैची विवंचना ।
मोठें तें पाप लोकांचें । प्रभू तो जाणता नव्हे ।
वर्ततो सिकविल्या बोले । तो काय म्हैसमंगळू ।
खर्चते काम तें ऐसें । रचतें काम तें नव्हे ।
कारबार बुडाला तो । कोण कोणास पूसतें ।
लाच चोरी बहू जालो । घालाघाली परस्परें ।
धण्याला नेणवे काहीं । बेदादी नगरी पहा ।
पाप हें थोर लोकांचें । सांगावे कवणापुढें? ।
घणी तो राहिला मागें । कारबारीच नासिती ।।
प्रपंच नासतो ऐसा । भाग्य जातें निघोनिया ।
यालागी सर्व सांभाळी । तोचि साहेब नेटका ।।
विद्यमान मऱ्हाठी राज्यमंडळात `साहेबा’चा तुटवडा नाही, पण त्यात `नेमके’ किती नि कोण, हे सामान्यांचे एक न सुटणारे कोडेच म्हणावे लागेल. सत्तेच्या अडणीवर बसण्याची प्रत्येकाची एटकेच न्यारी. काँग्रेसी वरिष्ठांचा पक्षप्रसाद आणि जातीयतेची पुण्याई या दोन एटकावरच त्यांच्या भालप्रदेशी सत्तेचा सिंदूरतिलक लावला जातो. पात्रापात्रतेची चौकशी पक्षीय भटारखान्यात व्हायचीच नाही. होतच नाही. कारण ज्याचा जसा वशिला तसा घ्यायचा त्याला कुशीला. इतके सारे जमल्यावर, कारबार बुडाला, नगरी बेदाद जाली, लाच चोरी बहू जाली, धण्याला नेणवे काही आणि कारबारी नासके, हा देखावा तयार झाला नाही, तरच ते एक आश्चर्य. भाग्य जाते निघोनिया आधी लोकांचे नि मागोमाग राज्याचे!
आज महाराष्ट्राची अवस्था नेमकी अशीच हे. सगळ्य राज्यांतून आणि प्रामुख्याने मद्रास, आंध्र नि केरळातून उप-यांच्या झुंडीच्या झुंडी टोळधाडीसारख्या मुंबई नि महाराष्ट्रभर लोटल्या आहेत, रोज शेकड्यांनी लोटत आहेत. सगळ्या सरकारी, निमसरकारी कचे-या नि कारखाने उपृयांनी काबीज केल्या आहेत. याशिवाय, जिकडे भरला दरा तो गाव बरा न्यायाने त्या त्या राज्यांतून तडीपार झालेले शेकडो लुंगीधर झोपडपट्ट्यांचा गजकर्णासारखा विस्तार करूनच थांबले नाहीत तर हातभट्ट्या चालवतात, लुटालूट करून स्मगल्ड मालांचा मुंबईच्या फुटपाथावर बेडर उभे राहून विक्री करतात. कुंटणखाने चालवतात. शेजारापाजारी राहाणा-या मऱ्हाठी लोकांवर बेधडक हल्ले चढवितात. कारखान्यात कामे करणा-या म-हाठी महिलांना छळतात, त्यांची छेड काढतात, बीभत्स शब्दांनी त्यांची अर्वाच्य होलपट काढतात. कित्येक कॉलरशर्ट लुंगीवाले तर उघडउघड म-हाठी लोकांना `बंबईपार हकाल देंगे, बंबईका मद्रास बनायेंगे, क्या समझता है तुम’ अशा धमक्याही देण्याइतके मगरूर झाले आहेत. मुंबईच्या सायंपत्रांतल्या लुटालूट, मारामा-या, खून, दरवड्यांच्या बातम्या वाचल्या तर त्यातल्या गुन्हेगारांत अनेक जातीय परप्रांतीय उप-यांचीच नावे आढळतात. ही गंभीर परिस्थिती कशाने निर्माण झाली? सरकारचा गलथानपणा नाही असे नाही, पण आमचाही अपराधाचा वाटा लहानसहान नाही. मऱ्हाठा महाराष्ट्र धर्माला पारखा झाला. जमातवादाचा एकजूट जिव्हाळा त्याने सोडला. आपुलकीची लिलाव-विक्री केली. राष्ट्रवादासारख्या पिसाटाच्या पचनी पडून महाराष्ट्राकडे पाठ फिरविली. आत्मोद्धाराची विवंचना न करता, विश्वबंधुत्वाची कधारी हातभट्टी ढोसली. आसेतूहिमाचल भारतात आपल्याला कोणी मानीत नाही, जुमानीत नाही, हे स्वच्छ नि स्पष्ट दररोज अनुभवाला येत असूनही स्वतःपेक्षा नि स्वकीयांपेक्षा इतरांच्या मैत्रिकीसाठी लाळ घोटण्यात कालापव्यय केला. त्याचा परिणाम काय झाला? उप-यांच्या टोळधाडीमुळे चढत्या भाजणीची महागाई बोकांडी बसली. रोजच्या घासासाठी लागणारे धान्यही चिमटीने मिळू लागले. रोगराईच्या हातात हात घालून भेसळीच्या अन्नाने स्मशानांची धण करण्याचा सपाटा चालू केला. रोजगार नाही, डोकी टेकायला जागा नाही, अर्धपोटी जगण्याची तंगडझाक केली, तरी सुरक्षित जिण्याची शाश्वती नाही. इतक्या शारीरिक, मानसिक, आर्थिक हलाकीने जगण्याचा प्रसंग महाराष्ट्रावर यापूर्वी आल्याचा दाखला नाही. पेशवाईच्या अखेरीला जागोजाग बंडाळ्या मातल्या, स्थलांतरांचे प्रसंग आले, दुष्काळानेही जीव बेजार केले, तरीही म-हाठी माणसे खचली नाहीत, `यहभी दीन जले जायेंगे’ इतक्या कणखर आत्मविश्वासाने त्यांनी भविष्याचा मार्ग चोखाळला. परकीय आंग्लायी राजवटीत दर्भधारी बामणांनी कानावर लेखण्या ठेवून कचे-या भरल्या. क्षत्रियांनी सैन्याच्या छावण्या गाठल्या. ज्याला जो मार्ग दिसला तेथे तो ताठ मानेने घुसला. कुठेही मऱ्हाठ बाण्याची अवहेलना होऊ दिली नाही.
आजची वस्तुस्थिती भयंकर स्फोटक आहे. शहाण्यासुरत्या पांढ-या गळोटीवाल्यांना आणि सरकारलाही याची कल्पनी आहे का नाही, कोण जाणे. महाराष्ट्रातच काय, उभ्या भारतात अकल्पनीय राज्यक्रांतीचे भयाण वारे वाहू लागले आहे. उपाशी पोटे, अन्न वस्त्र आस-याला मुकलेल्या बेकारांच्या वाढत्या टोळ्या आणि बेडर सरकार, या तिकोनी भांडवलावरच कम्युनिस्ट चळवळ्ये आपल्या सोवियती राज्यक्रांतीची चूड सहजगत्या पेटवीत असतात. दुर्दैवाने ती एकदा पेटली, की काँग्रेसी झार कामराजाचे सवाई राष्ट्रवापत्य, म. गांधींचा नि नेहरूंचा जयजयकार, दिल्लीच्या राजघाटीचे माजविलेले काशीविश्वेश्वरवत् पवित्र सोहाळे, राष्ट्राध्यक्षांची वेदान्ती प्रवचने, अलिप्तवादाची राष्ट्रीय पुराणे, `भाई भाई’चे कंठशोषी जयघोष, कशा कशाचीही पुण्याई कामी येणार नाही. आजकालच्या सडक धडक मोर्चे, घेरा डालो नि `बंद’ प्रकरणाची तुफाने याच दिशेने नि धोरणाने आखण्यात आलेली आहेत. उत्तर सीमांवर ठिकठिकाणी पाकिस्तान आणि चीन भारतावर निदानीचे हल्ले चढवायला वखवखलेले हेतच. इतके सगळे स्पष्ट नि बोलके असूनही अंतर्गत असंतोषाच्या होळ्या पेटविण्याचा आणि धुमसत असलेल्या काँग्रेसपक्षीय सत्तामदाच्या तेलाचे बुधल्यांवर बुधले ओतण्याचा दिल्लीवाल्या काँग्रेसी झोंडांची सोय यत्किंचितही कमी होत नाही. ना त्यांना बाहेरच्या राष्ट्रांचा म्हणावा तसा पाठिंबा, ना भारतातल्या एकाही भाषिक राज्याच्या जनतेचा जिव्हाळा निर्लेप राखण्याची बुद्धी! प्रत्येक राज्यात सत्ताधारी काँग्रेस पक्षाबद्दल आणि काँग्रेसी नेत्यांबद्दल असंतोष आणि संताप सारख धुमसतो. कपाळावर `सत्यमेव जयते’च शिक्का खोदलेला, पण ढोबळ सत्य स्थितीचे आव्हान स्वीकारण्याची मात्र हिंमत नाही. तेरा भाषिक राज्ये झाली, पण महाराष्ट्राला मात्र द्विभाषिकांच्या टोपलीखाली दडपून झाकून ठेवण्याचा खटाटोप! सारा महाराष्ट्र असंतोषाने भडकून उठला, सत्याग्रह मोर्च्यांचे रान पेटले, १०५ मऱ्हाठी जिवांचे बलिदान झाले, मुंबापुरी रक्ताच्या पाटांनी न्हाऊन निघाली. लाजेचे तर आधीच दिवाळे वाजलेले होते, आता काही इलाजच उरला नाही, तेव्हा नाक मुठीत धरून केंद्रीय झोंडांना महाराष्ट्र राज्याला संमती द्यावी लागली. तेथेही या राज्याच्या हद्दी ठरविण्यात हट्टवाद केलाच. म-हाठी डांगप्रदेश आणि उंबरगाव लाडक्या भांडवलदारी गुर्जरी राज्याच्या भक्ष्यस्थानी कोंबला. महिषासुराच्या घशात हकनाहक ढकलेल्या बेळगाव, कारवार,निपाणी, बिदरच्या म-हाठी प्रदेशाचे हाडूक असेच लटकते खटकते ठेवले. महाराष्ट्राविषयी कोणताही प्रश्न सुखासमाधानाने सोडवायचा नाही, हे सत्ताधारी काँग्रेसियांचं पेटण्ट धोरण. राज्याराज्यांत कसल्या ना कसल्या तरी असंतोषाचा ज्वालामुखी सारखा धुमसत ठेवूनच, हे सालाझारी पिंडाचे काँग्रेसी सत्ताधारी भारताचे स्वराज्य आणि स्वातंत्र्य सांभाळण्याच्या दिवास्वप्नात मग्न आहेत. परकीय आक्रमणाची पोलादी चपराक बसली रे बसली का लागले मग सारे महाराष्ट्राच्या क्षात्रधर्माच्या मर्माला मस्का चोपडायला. या मस्का-चोपडणीत आमचे बेकार नि भिकार मऱ्हाठी कवीही `जिंकू किंवा मरू’ आणि `हिमालयाच्या हाकेसरसा सह्याद्री धावला’ असल्या गीतांची फुकट फौजदारी करायला कासोटे सावरीत धावतात. एरवी, महाराष्ट्र जगतो कसा, मरतो किंवा मारला जातो कुठेकुठे, का मरतो, का मारला जातो, कोण मारतो, या तपशीलवार या कवींच्या प्रतिभेचा तांब्या उपडा पडतो. कवी म्हणजे सत्ताबाजांची लाळ घोटून पोट भरणारे भाट! भाटगिरीपेक्षा निराळे त्यांना काय सुचणार, शोभणार नि दिसणार? त्यांना घरबसल्या पेटलेला हिमालय दिसतो, पण महाराष्ट्राच्या आत बाहेर भडकलेले शतमुखी आपत्तीचे वर्णन मात्र नेमके भासत नाहीत नि दिसतही नाहीत. बहुतेक कवी पांढ-या गळोटीच्या गोत्रांतले. भरल्या पोटी भावगीते गाणारे महाजन ते. सत्ताबाजांकडून त्यांना पोटभर मुशाहिरा मिळतो. दिल्लीच्या प्रसन्नतेला उकळी फुटलीच तर एखादी पदवीही पदरात पडते. रेडिओवर त्यांच्या कवितांचा जल्लोष होत राहतो. राज्यातले `फर्स्टक्लास जण्टलमन’ म्हणून लोकसभेत किंवा राज्यसभेत खासदारकी, आमदारकीची उबदार धाबळ पांघरायला मिळते. मगबाज जित्या माणसाला याहून अधिक ते काय हवे हो? सा-या मऱ्हाठी समाज बेरोजगारी बेकार झाला, तरी या भाटांचा रोजगार कल्दार चलनी.
लेख ९
गलबला बुद्धी नासतो
युद्धाचा प्रसंग आला आणि यापुढे तो नेहमीच येणार – म्हणजे रंगरूटभरतीसाठी दिल्लीची पहिला हाक महाराष्ट्राच्या मऱ्हाठ्यांना आणि ती वाजवीही आहे. ब्रिटिश राजवटीत काय, किंवा त्या पूर्वीच्या मोंगल रियासतीत काय, भारतावर परचक्राची झोड आली का ती परतविण्यासाठी, विशेषतः मराठी जवानांनीच आपल्या सर्वस्वाच्या कुरवंड्या केल्या आहेत. पहिल्या नि दुसऱ्या युरोपीय महायुद्धातही मराठी जवानांनी आपल्या शौर्याने पाश्चिमात्य दोस्त नि शत्रू राष्ट्रांना अचंब्याने थक्क केले.
मराठा नि महार फलटणीतील अनेक वीरांनी व्हिक्टोरिया क्रॉसची पदके पटकावलेली आहेत. सातारा जिल्ह्यातला अपशिंगे खेड्याने जसे दर घरटी एक तरणाबांड जवान रणांगणावर पाठविण्याची पिढ्यान् पिढ्यांची परंपरा अखंड राखली आहे, तसे एखादे स्थळ म्हैसूर, मद्रास, आंध्र नि केरळला दाखवता येत असेल तर अलबत दाखवावे. असा काही लौकिक त्यांनी पटकावल्याचे ऐकिवात वा वाचनात तरी नाही.
नाही म्हणायला तेथल्या रोमन कॅथलिकांनी आणि इस्लामी मोपल्यांनी हिंदधर्मियांचा नायनाट करण्यासाठी रक्तबंबाळ बंडाच्या उठावण्या मुबलक केल्याचे दाखले रगड आहेत. काही वर्षांपूर्वी मलबारातल्या मोपल्यांनी बंडाचा भयंकर उठाव केल्याचे पुष्कळांच्या आठवणीत असेल. त्यावेळी म. गांधींच्या पुढारपणाखाली असहकारी चळवळ सर्वत्र जोरदार चालू होती. `भाई-भाई’चे खूळ वादळासारखे घोंगावत होते. तिकडे आबालवृद्ध हिंदू स्त्री-पुरुष, मुलांच्या राक्षसी हत्या धुमधडाक्याने बिनअटकाव चालू होत्या आणि गांधाळलेले पुढारी आणि त्यांची वृत्तपत्रे मलबारात सब कुछ आलबेल है, उगाच इकडेतिकडे थोड कुरबूर झाली इतकेच, असा बेशरम प्रचार करीत होते. मलबारात जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून आलेल्या कै. गोपाळराव देवधरांच्या अहवालाचीही काँग्रेसियांनी टरटिंगल केली. फक्त डॉ. अनी बेझंटबाईचा दैनिक न्यू इंडिया मात्र रोजच्या रोज तिकडील अत्याचारांच्या बातम्या तपशीलवार प्रकाशात आणीत होता. अत्याचारांचे धगधगते निखारे जेव्हा म. गांधींना आणि त्यांच्या काँग्रेसी भगतांना खादीच्या पंचांत चटके देऊ लागले आणि अखिल भारतीय हिंदू समाजात संतापाचा तीव्र प्रक्षोभ उफाळळा, तेव्हा अत्याचारांना रोज बळी पडत असलेल्या हिंदू जनतेबद्दल सहानुभूती नि सत्य परिस्थितीची कबुली तर राहोच, महात्मा गांधींनी काय केले? बंडखोर मोपल्यांना `जवानशूर मर्द मोपले’ अस पदवीदान करून त्यांची पाठ थोपटली. एका अर्थी ते रास्तच होते म्हणा. आक्रमणाला प्रतिआक्रमणाचा तडाखा न देता, देवावर नि दैवावर भार टाकणा-या हिंदुंपेक्षा, आक्रमक मोपलेच अहिंसावादी महात्म्याच्या स्तुतीला पात्र व्हावे, यात नवल कशाचे? `पीर परायी जाणी रे’ भजन गाणा-या वैष्णवावतार म. गांधींच्या तोंडून मलबारातल्या हिंदुवरील हत्याकांडाचा वा सहानुभूतीचा शब्दही निघाला नाही, किंवा मोपल्यांचा त्यांनी साधा शाब्दिक निषेधही केला नाही. तेव्हा तेथील हिंदू महिलांनी त्या वेळच्या व्हाईसरॉय लॉर्ड रेडिंगच्या पत्नीला दयेच्या याचनेचा एक जाहीर अर्ज पाठविला. त्यातील एक छोटासा उतारा वाचा, म्हणजे मोपल्यांना जवांमर्दीचे सर्टिफिकेट देणारे गांधी केवढे जबरदस्त महात्मे होते, याचा पडताळा पटेल, तो उतारा असा –
`दयावंत बाईसाहेब, गेल्या शंभर वर्षांत आमच्या या दुःखी मलबारात मोपल्यांचे दंगे अनेक वेळा झाले. पण चालू बंडाचा व्याप आणि त्याच्या अत्याचारांची क्रूरता पूर्वी कधीच कोणी अनुभवली नाही. या राक्षसांनी केलेल्या घातपाताची व अमानुष अत्याचारांची बाईसाहेब, आपल्याला कदाचित पुरी कल्पनाही नसेल. अहो, काय सांगावे? वाडवडलांचा प्रिय हिंदुधर्म सोडण्याचे नाकारल्यावरून, आमचे जिवलग नातलगांना अर्धवट ठार मारून त्यांना विहीरीत फेकून दिले. प्रेतांनी तळीसुद्धा भरून टाकली. गरोदर भगिनींची जिवंतपणी पोटे की हो चिरली, त्यांच्या शरीराचे राईराईएवढे तुकडे करून रस्त्यावर, जंगलात फेकून दिले. प्रेतांच्या खचात गर्भाशयातून अर्धवट बाहेर पडलेली मुलं तशीच तेथे पडलेली. अहो, आमची लहान तान्हुली – काय बरे त्यांनी कोणाचा असा अपराध केला – अहो ती आमची लाडकी तान्ही आमच्या गळ्यातून हिसकावून नेली आणि डोळ्यासमक्ष त्यांचे खाटकाप्रमाणे तुकडे तुकडे केले. आमचे प्राणापेक्षाही प्रिय असे पति, बाप, भाऊ यांचे अतोनात हालहाल केले.
कोणाच्या अंगाची सालटी जिवंतपणी सोलली, तर कोणाला जिवंत उभे जाळले. आमच्या शेकडो बहिणी आप्तेष्टांनी गजबजलेल्या घरातून फराफरा ओढीत नेल्या आणि त्यांच्यावर या नराधम राक्षसांनी मन चाहील तसे बीभत्स, उच्चारू नये असले अत्याचार केले, आमच्या घरादारांची राखरांगोळी केली. आमच्या डोळ्यासमक्ष क्रूरपणे कत्तल केलेल्या त्या बचड्यांच्या त्या केविलवाण्या किंकाळ्या, बाईसाहेब, आमच्या कानात एकसारख्या घुमत आहेत. काळ आमचे डोळे झाकीपर्यंत त्या किंकाळ्या कधीच थांबणार नाहीत. घरादारांची राखरांगोळी झाल्यावर केवळ जिवासाठी आम्ही नागव्या, उघड्या स्थितीत कसे रान-वन गाठले, आमच्या लपण्याच्या जागेचा सुगावा लागू नये म्हणून आमच्या अजाण बचड्यांना गप्प राहण्यासाठी आम्ही कसकसली धडपड केली, त्या सर्व गोष्टीचे, बाईसाहेब, आज स्मरण होत आहे, या खुनशी चांडाळांच्या धर्माची आम्हा हजारो लोकांवर प्राणांतिक बळजबरी झाली, त्या वेळच्या आमच्या नैतिक व धार्मिक मनाच्या वेदना आजही आम्हाला तितक्याच तीक्ष्णतेने दंश करीत आहेत. अहो, काय सांगावी आमची कर्मकहाणी! चांगल्या कुलीन घराण्यात वाढलेल्या आमच्या काही भगिनींना या चांडाळांनी जेव्हा मुसलमान धर्माची दीक्षा दिली व बळजबरीने कैद भोगलेल्या गुन्हेगार अशा कवडी किंमतीच्या मजुरांशी त्यांची लग्ने लावली, तेव्हा त्यांच्या मरणप्राय मानसिक वेदनांची, बाईसाहेब, आम्ही आपल्याला कशी कल्पना करून द्यावी?’
सध्या आपण लोकशाहीच्या सुवर्णयुगात वावरत आहोत का नाही, हा प्रश्न क्षणभर बाजूला ठेवून `वावरत आहोत’ असे समजून चालू या. पण वरचे पत्र हा इतिहासाचा अजरामर दाखला आहे आणि `इतिहास’ म्हणून त्याची दखल घ्यायला काही हरकत नाही. माणसे मेली तरी इतिहास मरत नाही. इतिहासाची पुनरावृत्ती होते की नाही, हा विद्वानाच्या तर्क रवंथाचा विषय असला तरी ती कधी होतच नाही, असे मात्र नव्हे. फार तर रंगभूमी निराळी, पडदे देखावे निराळे, पात्रे निराळी, भूमिका मात्र तीच असते. वर्तमानकाळच्या व्यवहारात माणसांनी कसं वागावं, कोणकोणत्या घटना अखंड स्मरणात ठेवाव्या आणि त्या अनुरोधाने भविष्यकाळातील जीवनाची आखणी कशी करावी, हेच भूतकाळच्या इतिहासावरून शिकायचे नि अखंड स्मरणात ठेवायचे असते. ज्यांना भूतकाळ नाही, त्यांना भविष्यकाळ नाही असे म्हणतात.
जवानमर्द शूरत्वाचे महात्मा गांधीचे सर्टिफिकट मिळालेल्या मोपल्यांनी कोणत्या युगात नि कोणत्या युद्धात मर्दुमकी गाजविली. महात्मा जाणे! इतिहासाचा तसा दाखला मात्र नाही, युद्धाच्या जुन्या म-हाठशाही जमान्यात सैन्याबरोबर बाजारबुणग्यांच्या टोळ्या जात असत. सैनिकाच्या संख्येपेक्षा या बाजारबुणग्यांची भरती मोठी. जागोजाग लूटमार करायची आणि झोळ्या भरभरून लूट आणून त्यावर गुजराण करायची. सध्याच्या युद्धनीतीत असल्या लुटमारी बुणग्यांना थारा नाही, प्रत्यक्ष सैनिक म्हणून रणांगणावर जाण्याची हिंमत नसली, तरी फक्त लूटमारीची सवलत मिळाल्यास मात्र दाक्षिणात्य उप-यांच्या रंगरूट भरतीचे भरताड आजही हां हां म्हणता तट्ट फुगून उतास गेल्याशिवाय राहणार नाही.
आज महाराष्ट्राचा मराठा आत्मस्वरूपाला पारखा होऊन, ना अस्त्री ना पस्त्री अशा मोहमयी अवस्थेत आहे. त्याचा उज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये, या धोरणाने त्याच्या या इतिहासाची जडणघडण नव्या राजकारणी रंगढंगाला साजेशी बदलण्याचा उद्योग चालू आहे. काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ दस्तांत आणि पिढ्यान् पिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवरही निरनिराळे बनावट अर्थ बनविण्यात येत आहेत. जिकडे पाहावे तिकडे –
गलबला बुद्धि नासतो । नाना निश्चय सांगती ।
ऐकावें कोणकोणाचें । बोलताहे बहूचकी ।
करण्टे मिळाले सर्वही । जो तो बुद्धीच सांगतो ।।
असा समर्थोक्त देखावा दिसत आहे. बुद्धीभेदाच्या या वावटळीत शिक्षितांपासून अशिशित मजुरांपर्यंत सारे गुरफटले गेले आहेत. जागृतीचा, उत्थानाचा बोध करील, तो जातीयवादी, संकुचित वृत्तीचा, देशद्रोही म्हणून त्याची सर्वत्र निंदानालस्ती आणि जाहीर सभांतून निषेध करण्यात येतो. कारण स्पष्ट आहे. महाराष्ट्राचा म-हाठा जागा होऊन आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेण्याइतका कदरबाज स्वाभिमानी बनू लागला, तर सत्तास्पर्धेच्या शर्यतीच्या रिंगणात आपापल्या पक्षीय घोड्यावर स्वार झालेल्याचे रिकिबीतला पाय लटपटल्याशिवाय राहणार नाहीत.
लेख १०
प्रतापे सांडिली सीमा
आजच पाहा ना. मुंबईचा ग्रास करू पाहणा-या दाक्षिणात्य उप-यांचा जबरदस्त भरणा ठिकठिकाणच्या झोपडपट्टयांमधून झालेला आहे, हे कोणाही डोळे शाबूत असलेल्या जिवंत माणसाला दिसत आहे. त्या सगळ्यांची नावे निवडणुकांच्या मतदारांच्या यादीत घुसडून त्यांना आपापल्या पक्षाचे मतदार बनविण्याचा उद्योग जोसात चाललेला आहे. जणू काय ते सारे झोपडपट्टीवाले सभ्यातले सभ्य, सज्जनातले सज्जन, प्रामाणिक, श्रमजीवी कामगार नि कामदार, आपला मायदेश सोडून बृहन्मुंबईत आले आहेत ते महाराष्ट्रावर नि म-हाठ्यांवर अनन्यसामान्य उपकार करण्यासाठी, तेव्हा त्या बृहन्मुंबईचे सन्मान्य नागरिक असा बाप्तिस्मा देऊन मतदार बनविण्याच्या पतित पावन पुण्यकर्मात कम्युनिस्ट, संसोपादि राजकारणी महाभाग सध्या हाडांची काडे करून रात्रंदिवस झगडत आहेत. खुद्द बृहन्मुंबईच्या स्थायिक रहिवाश्यांपेक्षा उप-या पाहुण्यांची संख्या मुबलक. तशात ते `बिचारे’ झोपडपट्टीत राहणारे, तेव्हा सत्तापिपासू पक्षांनी `आत्मवत् सर्व भूतेषू’च्या भूतदयेने त्यांचा उद्धार करण्याच्या बुरख्याखाली हा त्यांच्या मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेऊन बहुतेक पारही पाडला आहे. विश्वबंधुत्वाच्या बरण्यात आरपार मुरलेल्या या पक्षांना आणि म-हाठ्यांच्या भवितव्याचा मात्र चुकून कधी घाम फुटायचा नाही, कधी फुटलेलाच नाही. त्यांनी आपले पंचप्राण उप-यांच्या उद्धारासाठी पणाला लावलेले आहेत. `स्लम् क्लिअरन्स’ म्हणजे झोपडपट्ट्यांचे उच्चाटन हा सरकार आणि म्युनिसिपालिट्यांच्यापुढे एक काटेरी त्रांगड्याचा प्रश्न उभा आहे. ठिकठिकाणच्या झोपडपट्ट्या वरचेवर उखडण्याचे त्यांचे कार्य चालूच असते. अशा काही झोपडपट्ट्या लवकरच साफ करण्यात येणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे, कम्युनिस्ट संसोपादि पक्षियांनी येत्या निवडणुकीपूर्वी असे करू नका, म्हणून हाका आरोळ्यांची धमाल उडविली. तेवढ्यासाठी जाहीर सभा, मोर्चे, निषेधांचे रान पेटविण्याचा उद्योग केला. यात त्या झोपडीनिवासीच्या हिताचा मुद्दा नसून, येत्या निवडणुकीत संबंधित पक्षांच्या मतदानात उद्भवणारा संभाव्य धोका आहे, या इंगिताचा वास न येणाराचे घ्राणेंद्रिय बिघडलेले असावे.
एवढे कशाला? झोपडीनिवासी एक लाख मतदार आहेत, `त्यांची मते सत्ताधारी पक्षाला मिळणे शक्य नसल्यामुळे, महालक्ष्मी, वरळी, ताडदेव, शिवडी, नायगाव, लालबाग येथील झोपडपट्ट्या उडवण्यास ते (सत्ताधारी पक्षवाले) उतावीळ झाले आहेत.’ असा स्पष्ट रोप झोपडनिवाश्यांच्या हितचिंतकांनी जाहीर केलाच आहे. या आरोपातच त्या इंगिताची कबुली स्पष्ट होत आहे. म्हणजे झोपडपट्ट्या सांभाळण्यात आणि वाढविण्यातही पक्षीय राजकारण खेळणारांचे हुकमी भांडवल गुंतलेले आहे, इतकेच नव्हे तर झोपडपट्ट्या म्हणजे त्या त्या पक्षांचे अंतर्गळासारखे नाजूक मर्म बनले आहे. हे आणखी स्पष्ट करायलाच नको.
केवळ पोटतिडकीने, कोणाच्याही रागालोभाची नि धमक्यांची पर्वा न करता येथवर केलेल्या विस्तृत विवेचनावरून आपण आज नक्की कोणत्या विलक्षण नि भयंकर दुरावस्थेच्या कोडेबाज कचाट्यात सापडलो आहोत, याची महाराष्ट्रातील मराठ्यांना स्पष्ट जाणीव होईल असे मी समजून चालतो. या चक्रव्यूहातून सहीसलामत बाहेर पडायचे तर प्रत्येक स्वाभिमानी नि महाराष्ट्राभिमानी म-हाठ्याने प्रथम एक भक्कम जाणिवेची खूणगाठ बांधली पाहिजे ती हीच. कोणताही राजकारणी पक्ष आपल्या धावण्याला धावणार नाही. महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा बकवा करणा-या संयुक्त वा संपूर्ण आघाड्या असोत, किंवा सवत्यासुभ्याच्या दिमाखाने वावरणारे पंथ-पक्ष-पार्ट्या असोत, सगळ्यांचा आंतरिक ओढा राज्याराज्यातील राजसत्ता काबीज करण्याचा आहे. जणू काय या ना त्या पक्षाचे ठाण राज्यसत्तेवर अथवा केंद्रीय सिंहासनावर चिकटले का बोल बोलता भारताच्या तकदीराचा त्रिकोण चौकोन बनणार. तसा तो बनला तरीही महाराष्ट्राचे झालेले नि नित्य होत असलेले वाटोळे मात्र अखिल भारतीय राष्ट्रवादाने उरफाटलेल्या त्यांच्या डोळ्यांना दिसणार नाही, दिसले तरी ते पाहणार नाहीत. काँग्रेसने आजवर काय दिवे लावले, तर हे पुढे टेंभे पाजळणार आहेत?
सत्तेसारखी जलाल दारू दुसरी नाही. तिचा एकच घोट पोटात गेला, अथवा तिचा नुसता वास आला का माणूस बेभान होतो. आपपर भेदाचे भान त्याला राहत नाही. तिच्या घोटासाठीही तो हव्या त्याच्या नरडीचा घोटही घेतो. त्या घोटासाठी स्वतःच्या संसाराच्या पोटावरही लाथ मारायला तो लाजत बुजत बाचकत नाही. साधे दारूचे व्यसन निग्रही माणूस सोडू शकतो. पण सत्तेच्या सोमरसी पिठ्यात लोळणारा एखादा मंत्री, आमदार, खासदार पदच्युत होऊन बाहेर फेकला गेला, म्हणजे त्याची अवस्था किती वेड्यासारखी दीनवाणी होते, याचे दाखले पुष्कळांनी पाहिले असतील. हुद्यावर असताना त्याच्या गाडीला सार्वजनिक यष्टीने तात्काळ बाजूरा करून वाट करून दिली नाही, तर हे महाशय त्या यष्टी-ड्रायव्हरला डिसमिस करण्याचा जागच्याजागी हुकूम सोडतात आणि पदच्युती गचांडी मिलाल्यावर क्यूमध्ये उभे राहून बसने मुकाटतोंडी प्रवास करतात. गेन्या गंप्याच्या खांद्याला खांदा घासतात. याच वेळी त्यांना जनता जनार्दनाचे दर्शन घडण्याचा किंचित योग येतो. सत्तेची दारू ढोसून हुद्याच्या घोड्यावर स्वार असताना, जनता संपर्काचा होत असलेला फार्स लाल सकलादीच्या पायघडीपुरताच असतो. तेथे जनता नसते नि संपर्कही नसतो. असतो तो फक्त सत्तेचा दिमाख.
मऱ्हाठ्यांना महाराष्ट्रातल्या अठरापगड स्थायिक जमातींना एकजीव, एकजिव्ह एकवटूनच आपल्या जीवनाचे गुंते सोडविले पाहिजे. महाराष्ट्राचा म-हाठा म्हणून आपल्याला ताठ मानेने जगायचे आहे. छाती काढून निर्भय निर्धोकपणे समाजात नि व्यवहारात वागायचे आहे, तेखदार मराठबाण्याने आपल्य वाजवी हक्कांसाठी जागच्या जागी थांबून लढे द्यायचे आहेत, जगायचे तर मर्दासारखे नि मरायचे तेही मर्दाच्या मरणाने, तर पहिल्या प्रथम वैयक्तिक, कौटुंबिक, जातीय, ग्रामीण यच्चयावत सर्व भेदांवर निखारे ठेवून, अभेद एकवटणीचा श्रीगणेशा काढला पाहिजे. `महाराष्ट्रधर्म’ म्हणजे महाराष्ट्रालाच परमश्वर मानून, त्यांच्या आत्यंतिक भक्ती-पूजनासाठी मराठा तितुका मेळवावा ही समर्थांची हाक आहे. या हाकेने १७व्या शतकात याच महाराष्ट्रधर्माने म-हाठ्यांचा परमोच्च उत्कर्ष केला.
स्वधर्माआड जे विघ्नें ।
ते ते सर्वत्र ऊठिलीं ।
लिटिलीं कुटिलीं देवें ।
दापिली कापिली बहू ।।
विघ्नांच्या उठिल्या फौजा ।
भीम त्यावरी लोटला ।
घर्डिली चिर्डिली लागें ।
रडविली बडविली बळे ।।
हाकिली टाकिली तेणे ।
आनंदवन भूवनी ।
हाकबोंब बहू जाली ।
पुढें खत्तल्ल मांडिले ।।
खौळले लोक देवाचे ।
मुख्य देवचि ऊठिला ।
कळे ना काय रे होते ।
आनंदवन भूवनी ।।
देवे भक्त एक जाले ।
मिळाले जीव सर्वही ।
संतोष पावले तेथे ।
आनंदवन भूवनी ।।
सामर्थ्य यश कीर्तीची ।
प्रतापे सांडिली सीमा ।
ब्रीदेंचि दीधली सर्वै : आनंदवन भूवनी ।।
महाराष्ट्र-देवाचे लोक खवळले. देव, आणि भक्त एक झाले, एकवटले, मग हो काय? मुख्य देवचि ऊठिला, तोच उठल्यावर बहु हांक बोंब होणारच. ही जातीयता आहे, अशा बोंबा मारणारे उपटणारच. पण त्या सगळ्या फितवेखोरांना जागच्या जागी `लाविली कुटिली देवे दापिली कापिली बहू’ असे झाले म्हणूनच सामर्थ्य यज्ञ कीर्तीच्या प्रतापे सीमा सांडिली.
लेख ११
झुणका भाकरीच्या आड येऊ नका
महाराष्ट्रवाद म्हणजे एकमेकां साह्य करू, वघे धरू सुपंथ, या न्यायाने नि धोरणाने होणारी जातिभेदातीत पण जमातवादी म-हाठ्यांची संघटना. आता अनेक तथाकथित राष्ट्रवाद्यांच्या डोळ्यांत ती सलू लागली आहे. राज्य पुनर्रचनेच्या नावाखाली बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकी या म-हाठी प्रदेशांचा महिषासुराला बळी दिलाच आहे. मध्यप्रांतातही बस्तारसारखे अनेक जिल्हे दडपले आहेत. गरीब, अडाणी आदिवासींना टांग मारून डांग नि दादरा-हवेली गुजराथ्यांच्या घशात कोंबलीच आहे. तेथील मऱ्हाठी जनतेने महाराष्ट्र राज्यात समाविष्ट होण्याची चळवळ केली, का तिला म-हाठ्यांची जातीयवाद दंगल ठरवायची. एका थोबाडाने लोकशाहीची प्रवचने झोडायची आणि विलिनीकरणवादी म-हाठ्यांच्या राजरोज सिद्ध झालेल्या लोकमताला लाथाडायचे, असा `राष्ट्रीय पाजीपणा’ गेली दहा वर्षे अखंड चाललेला आहे. जर्मन राष्ट्राप्रमाणे बेळगावचीही विभागणी करून, भारतीय बर्लिन वॉलचाही प्रयोग करण्याच्या सूचना पुढे येत आहेत. एवढ्यानेही राष्ट्रवादी कॉस्मापोलिटनवाल्यांचे समाधान झालेले नाही. त्यांनी आता मुंबई शहर – राज्य केंद्रशासित व्हावे, अशा आकांडतांडवी हाका आरोळ्या मारण्यास प्रारंभ केला आहे. थोड्याच दिवसांपूर्वी ५०० काँग्रेसी गणंगांनी या उद्देशाने दिल्ली दरबारात एक अर्जी पेश केली, मुंबईच्या मुळावर बसलेल्या बांडगूळ बीपीशीशीच्या छावणीतले हे अर्जदार होते. त्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने निकराचा ठणाणा केला नि ते प्रकरण विझल्यासारखे दिसत होते. पण छे! महाराष्ट्र राज्याचे आजवर हातपाय तर तोडलेच. आता त्याचे मुंडके जे मुंबई शहर ते छाटून साफ करायला त्या ५०० काँग्रेसी खाटकांच्या हाताला हात लावण्यासाठी आता काही कॉस्मापोलिटन जंटलमेन सरसावले आहेत.
दि. ८ ऑक्टोबर १९६६च्या टाइम्स ऑफ इंडियात पाच बहुढंगवादी जंटलमननी `मुंबईचे भवितव्य’ मथळ्याखाली एक पत्र लिहिले आहे. त्यातील विचार संक्षेपाने सांगतो –
- मुंबई केंद्रशासित करावी, अशा सबबीचे ५०० काँग्रेसजनांनी जे निवेदन अलिकडे काँग्रेसाध्यक्षाला पाठविले होते. त्यातील विधाने बळकट असून ती बरीच विचार करण्यासारखी आहेत.
- मध्यंतरी मुंबईत पाण्याचा तुटवडा पडला, तेव्हा श्री. बेलोसे यांनी बिगर मऱ्हाठी लोकांना (शहराबाहेर) घालवावे, अशी जी सूचना केली होती, ते एक अवलक्षणी भाकीत होय.
(श्री. बेलोसे यांनी नॉन् महाराष्ट्रीयन असा उल्लेख मुळीच केला नव्हता. `बाहेरून जे उपरे लोक दररोज शेकड्यांनी मुंबईत येत आहेत त्यांचा लोंढा थोपवून धरा,’ अशा सूचना होती. पण त्या सरळ नि साध्या सूचनेचा कांट्याचा नायटा केला बी पी शी शी वाल्यांनी.)
-
सगळ्या बिगर म-हाठ्यांना मुंबईबाहेर हुसकावून देण्याचा माथेफिरू चळवळ्यांकडून महाराष्ट्र सरकारवर जोरदार आग्रहाचा शह लावण्यात येईल. त्याला महाराष्ट्र सरकार कितपत तोंड देऊ शकेल आणि केंद्र सरकारही त्याला कितपत आवरू शकेल, याची आम्हाला शंकाच आहे.
-
हौसिंग बोर्डाच्या इमारतीत जागा मिळविण्यासाठी मुंबईत दहा वर्षांच्या वसतीची जी अट घातली आहे ती (सुरुवातीची) अणकुचीदार मेख आहे. आणखीही कडक अटीची भट्टी शिजत असेल.
-
मध्यंतरी `मुंबई बंद’ आणि `घरा डालो’ आंदोलनाच्या प्रसंगी, कायदे नि सुव्यवस्था पाळणाऱ्या नागरिकांनी नि त्यांच्या मालमत्तेला भरपूर संरक्षण देण्याच्या कामी महाराष्ट्र सरकारने आपली नालायकी सिद्धच केली आहे.
-
तोबा तोबा! या मुंबई शहराचा बहुढंगी कॉस्मापोलिटन नूर भराभर नाहीसा होत चालला हो आणि तेथे स्थायिकपणाला रंग चढू लागलाय, हा रंग तसा काही वाईट नाही, पण त्याने बहुढंगाशी जुळते मिळते घेतले पाहिजे.
-
अहो, आता दिल्ली नि चंडीगढ केंद्रशासित राज्ये झालीच ना? मग मुंबईचे तसे केले तर अडणार कुठे?
-
आता `ओरोनियन पोल’ (रहिवाशाचे मतदान) पद्धत चलनी केलीच आहे. तेव्हा (मुंबई कोणाची?) हा प्रादेशिक रहिवाशांचा प्रश्न सुटायला हरकत नाही.
-
सगळ्या भारतातून आलेल्या लोकांनी मुंबई शहराच्या भरभराटीला हातभार लावलेला आहे आणि आज ते लावीतही आहेत. अशा अवस्थेत मुंबई म्हणजे खास म-हाठ्यांची अशी इनादारी होणे इष्ट नाही.
या ९ कलमी फतव्याखाली एस.के. सहा, खुरशेद खंबाटा, एस. एम. पटेल, ए. सी. नायर आणि एस. रामस्वामी अशा पंच पंडितांच्या सह्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या धडापासून मुंबईचे मुंडके सफाचाट छाटण्यासाठी धाधावलेल्या या सह्याजीरावांची जातकुळी कोणती, हे न सांगताही कळण्यासारखे आहे.
एवढ्यानेही राष्ट्रवाद्यांचे समाधान होण्यासारखे नाही, `राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा’तर्फे प्रकाशित होणा-या `राष्ट्र भारती’ या मासिकाच्या `अक्टूबर १९६६’च्या अंकात `बापूकी हत्या और उसके बाद!’ मथळ्याचा लेख डॉ. जगदीश जैन यांचा `गांधी जयंतीकी पुण्य स्मृतिमें’ एक लेख आला आहे. हे डॉ. जैन कोण? तर म. गांधींच्या हत्या-कटाचा सुगावा लागताच ज्यांनी `दौड-धूप शुरू की, बंबई सरकारके दरवाजे खटखटाए, लेकिन बदकिस्मतीसे कोई वाज सुनाई नहीं दी’ ते गृहस्थ.
मुंबईच्य पाणी-टंचाईच्या वेळच्या श्री. बेलोसे यांच्या उद्गारांचे विकृत वृत्त वर्तमानपत्रात वाचताच `पानीके अभावमें बंबई खाली करनेमे भी मराठी और गैर-मऱ्हाठियोंका भेद?’ असा साहजिकच प्रश्न त्यांनी विचारला आहे. वस्तुस्थिती अजून त्यांना कळली का नाही कोणी सांगावे? वर त्याचा खुलासा केलेलाच असल्यामुळे पुनरुच्चार नको.
पण नुकतेच त्याच्या एका मित्राने `मार्मिक’चे १७जुलै, ३१ जुलै आणि ७ ऑगस्टचे अंक पाठविले. ते वाचताच डॉक्टरसाहेब म्हणतात `पावके नीचेकी जमीन ही खिसक गी’. नंतर त्यांनी `मार्मिक’ची व्यंगचित्रे पाहून सखेद आश्चर्य व्यक्त केल्यावर मऱ्हाठ्यांच्या सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक पुनरुत्थानासाठी जन्माला आलेल्या शिवसेनेकडे आपला मोर्चा वळविला. शिवसैनिकांच्या शपथपत्रिकेवरील सूचना आणि महाराष्ट्र सरकारला द्यावयाच्या खलित्यातील मागण्या संपूर्ण उद्धृत केल्या आहेत. ठीक आहे. हे या लेखाने राष्ट्रवादी महात्म्यांना जाहीर कळविल्याबद्दल `मार्मिक’तर्फे डॉ. जैन यांचे करावे तेवढे अभिनंदन थोडेच होणार आहे.
डॉक्टरसाहेब म्हणतात - `बंबई आदि स्थानोमें ऐसे कितनेही व्यक्ति हैं जो अपना घरदार छोडकर बंबईवासी बन गये है. बंबईमे रहते हुए वे अपना छोटामोटा धंदा चलाते हैं या नोकरी पेशा है. महाराष्ट्र ही उनका घर हो गया है. महाराष्ट्र के संस्कृतीमें उन्होंने एकता स्थापित कर ली है. मराठी अथवा मराठी भाषाभाषी, परिवारोंमें उनके विवाह आदि संबंध हुए है. और संयुक्त महाराष्ट्रके आंदोलन में उन्होंने यथाशक्ती हिस्सा भी लिया है.’
आरामखुर्चीत बसून विचार करणारे आणि लेख लिहिणारे हे डॉक्टर दिसतात. त्यांचे शेवटचे विधान तर सत्याचा अपलाप आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी जे १०५ आसामी बळी पडले, ते तर सारे मऱ्हाठेच होते. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी एकजीव झालेले आणि महाराष्ट्रालाच आपले घर मानणारे कितीसे `इतर’ त्या आंदोलनात म-हाठ्यांच्या पाठीशी उभे राहून रक्त नि घाम गाळीत होते? तो लढा फक्त मऱ्हाठ्यांनीच एकवटून लढवला. इतरेजन फक्त जमाशा पाहात होते आणि इंग्रजी दैनिकात मऱ्हाठ्यांच्या मागणीची टरटिंगल नि निंदा करीत होते. उगाच कशाला त्यांच्या यथाशक्ती हिस्सेकी तरफदारी करते हो?
अपना घरदार छोडकर मुंबईत झोपडपट्ट्यांच्या वसाहती फुलविणारे काय महाराष्ट्र संस्कृतीशी तन्मय होण्यासाठी धावले आहेत होय? महाराष्ट्र जर या पाहुण्यांचे घर म्हणावे तर दर महिन्याला लाखो छे, कोटी कोटी रुपयांच्या मनीआरडरी मुंबईतून बाहेर जातात, त्या कोणत्या घरासाठी? हातभट्टी, जुगार, कुंटणखाने, दंगली, ही महाराष्ट्र संस्कृतीची लक्षणे या डॉ. महाशयांना कोणी सांगितली! मुंबईमध्ये अठरापगड जाती मुंबईच्या जन्मापासून चालू राहत आहेत. त्या सर्व येथे स्थायिकही झाल्या आहेत. त्यांचा नि मुंबईचा मऱ्हाठ्यांचा नाही कधी तंटा बखेडा झाला? मग आत्ताच का? (हिंदू-मुसलमान दंगा नेहमीच अपवाद) याचा खुलासा काढण्यासाठी डॉक्टरसाहेबांना आरामखुर्ची सोडून जरा झोपडपट्ट्यांची पाहणी करावी लागेल. म्हणे घरदार सोडून मुंबईला नि महाराष्ट्र महाराष्ट्रात आले! मुंबईच्या स्थायिक जमातीवर जणू उपकारच करण्यासाठी!
येथे अलिकडेच आलेल्या पांढऱ्या गळोटीच्या मद्रासी, आंध्रीय, म्हैसुरी, केरळीय, मलबारी जमातींनी आपापले संघ स्थापावे, मोठमोठ्या जातीय संस्था उभाराव्यात, जातीय व्यवसाय-शोधन केंद्रे चालवावी, नोकरीच्या प्रत्येक क्षेत्रात आपापला जातभाई – त्याची लायकी असो नसो – कटाक्षाने घुसडावा, पोट भरण्याची सारी क्षेत्रे मऱ्हाठ्यांना कुलूपबंद करून सोडावी, आणि... आणि आम्ही विस्कळीत मऱ्हाठ्यांनी जरा कुठे एकजुटीचा एल्गार पुकारला का लगेच `जातीयवाद, सम्प्रदायवाद’, `और भाईभतिजावादके नारे लगाकर अपनी संकीर्णताका परिचय देने लगे तो इससे बढकर देशद्रोह और क्या होगा.’ म्हणून दोन दोन मुठींनी ठणाणा करता? वा रे वा तुमचा राष्ट्रवाद. बाहेरच्यांनी येऊन म-हाठ्यांना बुडवले तुडवले म्हणजे देशभक्तीचा नमुना, आणि आम्ही, `मऱ्हाठ्यांनो, अभेदभावाने एकजूट व्हा’ असा पुकारा करताच, तुमच्या जैन पिनल कोडात तो देशद्रोही ठरतो आं? इतकेच नव्हे, तर व विश्वप्रेमी महाशय केंद्र सरकारला ऐसा अनुरोध कर रहे हैं की `हिंदुस्थानके अलग अलग सूबोमें प्रान्तियता अथवा जातीयताके नामपर जो साम्प्रदायिकताकी आग भडकानेका यत्न हो रहा है उसे कुचल देनेके लिये पुरी ताकदसे काम किया जाय.’
जातीयता नि सांप्रदायिकता नाही कुठे? काँग्रेस पक्ष तर त्यांनी आरपार बुजबुजलेला नि सडलेला आहे. खुद्द काँग्रेसाध्यक्ष तर जातीयता नि सांप्रदायिकतेचा काळाढोण पुतळा म्हणावा लागेल. `हिंदी भाषेत आलेले केंद्राचे सारे फतवे केराच्या टोपलीत टाका’ म्हणून जाहीर सांगणारे कामराज काय राष्ट्रावादाचे मुरंबे समजायचे होय? जातीयता नि सांप्रदायिकता पुरी ताकतसे चेचून ठेचून काढण्याची केंद्राला शिफारस करणा-या डॉ. जैनानी मुसलमानांच्या जातीयतेकडे आणि सांप्रदायिकतेकडे नुसता अंगुलिनिर्देश करून पाहावा, म्हणजे समजेल काय इंगा असतो तो. कायद्यांना पाळणा-या आमच्या विशिष्ट मऱ्हाठी संस्कृतीची इभ्रत राखून कायद्यातील न्याय हक्कांसाठी झगडणाऱ्या मऱ्हाठ्यांनाच कशाला या धमक्या? केंद्रीय अधिकारावर असणाऱ्यांनी कोटी कोटी रुपयांच्या अफरातफरी केल्या, तेव्हा आपली लेखणी कधी चुरचुरली का पुरी ताकतसे त्या राष्ट्रद्रोह्यांना कुचलून काढा म्हणून!
सध्याच्या काँग्रेसी जमान्यात हवे त्याने उठावे आणि महाराष्ट्र नि मराठ्यांची मन मानेल तशी अवहेलना करावी, हे या पुढे चालणार नाही. हो, आम्ही जातीयवादी आहोत. प्रांतीयवादी आहोत. सांप्रदायिकतेचे एकनिष्ठ भोक्ते होत. आकाशाला गवसणी घालणा-या विश्वबंधुत्वाचे थेर नि थोतांड डॉक्टरसाहेबांप्रमाणे आम्हा छत्रपती श्रीशिवरायाच्या इनामी लेकरां पथिकांना झेपणारे नाही. म्हणूनच एकदाच खुशाल सांगून टाकतो, तुम्ही विश्वप्रेमाच्या शतपक्वान्नी मेजवान्या खुशाल झोडीत राहा, पण आम्ही सहनशील नि गरीब मऱ्हाठ्यांच्या झुणका भाकरीच्या आड येण्याचे साहस करू नका.
लेख १२
मारिता मारिता मरावे
पोटतिडकेने आणि निर्धाराने हाती घेतलेल्या कार्याला विरोध होऊ लागला का खुशाल मनाशी खूणगाठ बांधावी आपल्या कार्यात राम आहे, तेज आहे आणि अंतिम यशाची बिनतोड हमी आहे. यशाचे काचनगंगा शिखर गाठताना आपल्याला शेकडो आक्षेपांना, आरोपांना आणि विरोधांना हिमतीने नि बेडरपणाने तोंड द्यायचे आहे. पोलादी जिद्दीचे हे काम असते. तिथे थातुरमातुर चालणार नाही. कामचुकापणा चालणार नाही.
जातिवंत म्हणावे ।
त्यांनी वेगी हजर रहावे ।
हजीर न राहता पस्तावे ।
लागे पुढे ।।
शिवकालातली ही समर्थांची हाक आपल्या हृदयात सारखी सणसणत राहिली पाहिजे.
भिन्न भिन्न तत्त्वप्रणालीचे धर्म समाजात वावरूलागले का साहजिकच परस्पराचे एकमेकाशी घर्षण चालू होते आणि विरोधाच्या चकमकीची पहिली ठिणगी तिथे पडते. अतिप्राचीन काळी आर्य आणि अनार्य अशा दोनच धर्मात कोपरखळ्यांचे खेळ चालत असत. त्यानंतर आर्य म्हणजे वैदिक धर्म विरुद्ध इस्लाम नि ख्रिस्ती धर्म संघर्षाला प्रारंभ झाला. तो आजही चाललेलाच आहे. सापमुंगुसाचे हे द्वैत मिटविण्याचे भगिरथ प्रयत्न करणारे अनेक महात्मे झाले नि गेले. संघर्ष कायम! उलट, त्या यत्नांच्या घासाघाशीत तिसराच आणखी एखादा नवा धर्म उपटत गेला. संघर्षाच्या कक्षा सारख्याच वाढत आहेत. त्याचे जुने आध्यात्मिक तंत्र नष्ट होऊन आज त्याला केवळ लौकिकी, व्यवहारी, व्यापारी नि बाजारी स्वरूप आलेले आहे. तत्त्वज्ञानालाच बाजारबसवीचे रूप आल्यावर, तिला राजकारणाशिवाय दुकान मांडायला दुसरा चव्हाटा असणारच कसा?
चालू जमान्यात नाना रंगीढंगी पैदास मुंबलक झाली हे नि रोज ती वाढत आहे. वर म्हटल्याप्रमाणे त्यात आध्यात्मिक मोक्षाचा संबंध नसून, राजकारमाचा भडिमार जबरदस्त आहे. आजकालच्या राजकारणी संघटना, पार्ट्या, पंथ, पक्ष हे त्यांच्या ठराविक धर्माचे लहानमोठे मठच म्हटले तरी चालेल. `हे मर्त्य मानवा, तू आमच्या धर्माचा गण्डेकरी होत, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षइष्यामि’ असा प्रत्येक धर्ममठाचा पुकारा प्रत्यही आपल्या कानावर आदळत असतो. प्रत्येकाचा पुकारा एकच असला, तर प्रत्येकाच राजकारणी मोक्षाचा मसाला न्यारा. हा न्यारेपणा इतका अनेक-रंगी, की कोणाचे कोणाशीही जुगत जमत नाही. कम्युनिस्ट म्हणतात `धर्म ही अफूची गोळी.’ पण त्यांनासुद्धा लेनिन-स्तालिन मतवादाची म्हणजेच त्या नावाच्या धर्माची गांजाची चिलीम ठासावीच लागते. काँग्रेसवाल्यांनी तर आपल्य पंथीय धर्माचा छपन्न मसाल्याचा चिवडा बनविला आहे. भारतीय घटनेत नावनिशाणी नसलेले `सेक्युलरिझम’ (म्हणजे धर्मातीतपणा) हे क सोयिस्कर फिसाट ते चावीत चघळीत असतात. तंबाखू खाणा-याच्या बोकाण्याप्रमाणे त्यांची गालफडे सदैव फुगलेली असतात. काँग्रेसी धर्मपंथियांत तविशेष म्हणजे त्यांच्या खादी पोषाकाचा युनिफार्म. तो अंगावर चढला का काँग्रेसी धर्माची सारी तत्त्वे त्यांनी पायदळी तुडवली तरी पाप लागायचे नाही. त्यांची `सत्यमेव जयते’ ही धर्मबोध मुद्रा म्हणजे लफंग्या गोसावड्यांच्या भस्मपट्ट्याचा इरसाल नमुना. पदोपदी सत्याची लाथाडणी करून पुन्हा तो मंत्र बडबडण्याचा बेशरमपणा फक्त काँग्रेसी धर्मपंथियांनीच करावा. धर्म आणि नीति विषयीच्या भावना कल्पना आता पूर्वीसारख्या सोवळ्या राहिलेल्या नसून, स्पृश्यास्पृश्य भेदाची भानगड नसलेल्या राजकारणी धाबळ्यांमुळे त्या `ओवळ्या’ झाल्या आहेत.
जो मठ उठला तो दुस-या मठाला खाली खेचून स्वतः शिरजोर होण्याच्या धडपडीत गुरफटलेला. सगळ्या राजकारणी धर्मपंथियांच्या पोथ्या नि बायबले वाचली, त्यांची प्रवचने नि आश्वासने ऐकली, का भला कोण नि बुरा कोण, याचा ताळमेळ सामान्य माणसाला घालता येत नाही. किंचित विचार करणारा असला तरीही तो भांबावून जातो. मग पोटापाण्याच्या प्रश्नाने पीडलेल्या पामरांची ती कथा काय? अखेर, चला, या अमुक तमुक पक्षधर्माचा बाप्तिस्मा घेतल्यावर तरी कर्माची खटखट मिटते का ते पाहू, अशा भावनेच्या आहारी गेलेले हजारो लाखो मऱ्हाठे –
काशी केली, वाराणशी केली,
जन्माची खटखट नाही गेली,
असा अवस्थेत अक्षरशः दिग्मूढ होऊन बसले आहेत. या ना त्या पक्ष धर्माच्या धर्माज्ञा म्हणून संप केले, उपासमार भोगली, मोर्चे काढले, दंगल केली, लाठीमार गोळीबार खाल्ला, अखेर हातात काय? मेहनती दिलगीर नि पक्षमार्तंड हुश्शार! महाराष्ट्राचा मऱ्हाठा आज भिकेला महाग! बेकारीची कुऱ्हाड नेमकी त्याच्याच माथ्यावर! उपरे झाले शिरजोर नि मऱ्हाठा पडला फुटपाथवर. तो आपले गमावलेले स्थान मिळवण्यासाठी धडपडू लागला, का डॉ. जैनासारखे पोफळेश्वर हा देशद्रोह तो देशद्रोह! म्हणून लागतात ठणाठणा करायला. आंग्रेजी रियासतीला राजद्रोहाच्या कलमाविरुद्ध फाल्गुनी बोंबा मारणारे काँग्रेसवाले आपल्या सत्तेची मांड टिकवायला तसेच सरसावले आहेत. आंग्रेजी राजद्रोहाप्रमाणेच या कांग्रेजी राजद्रोहाला ना आई ना बाप, ना शेंडा बुडखा.
दुष्काळ पडला. लोक अन्नान्न करून मरू लागले, का ख्रिस्ती मिशन-यांच्या भूतदयेला जशी उधाण भरती येते, तशी निवडणुका जवळ आल्या का स्वदेश बांधवाच्या कोटकल्याणाच्या निरनिराळ्या पक्षधर्मियांच्या जिव्हाळ्याला अपरंपार भरती येते. मागाल ते वरदान हुकमी हजर. संस्कृतपंडित महाशय कण्टकार्जुन यांच्या `कण्टकांजलि’ या ग्रंथातली `निर्वाचनसूक्तम्’ (निवडणुकस्तोत्र) ही संस्कृत कविता (मराठी अर्थासह) या संदर्भात देण्यासारखी आहे, म्हणून देतो –
काले वर्षतु मातिवर्षतु घनो,
भूमिश्च मा कम्पतां,
दत्ता क्षेत्रमकृष्टमेव हि फलं,
स्यादश्रमं वेतनम्
स्त्रीणां सुप्रसवो स्त्वगर्भवहनम्,
मा भूच्च मृत्योभर्यम्
प्राप्तु सर्वमिदं यदीच्छथ
ततो मह्यं मत दीयताम्
अर्थ : पाऊस वेळेवर पडावा पण अति पडू नये, भूकंप होऊ नयेत, जमीन न नांगरताच पीक पदरात पडावे; काम न करता पगार मिळावा, स्त्रियांना गर्भ न राहताच प्रसूत होता यावे. कोणालाही मरण येऊ नये, हे सर्व व्हावयास तुम्हाला हवे असेल, तर लोक हो, मला मत द्या.
या कण्टकीय सुभाषितातले उपहासगर्भ विनोदाचे काटे क्षणभर बाजूला ठेवले, तरी बहुतेक सगळ्या पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यातली आश्वासने अशाच थाटामाटाची असतात, वेदांतातल्या परब्रह्मांची लांबी रुंदी बिनचूक अटकळीत आणण्याची ज्या पामराची आध्यात्मिक ताकद सुजलेली असेल, त्यालाच काँग्रेसी समाजवादाचा अंदाज लावता येईल.
काही असले तरी आज बहुतेक मोठमोठ्या पक्षांना म-हाठ्यांच्या मतांची फारशी पर्वा उरलेली नाही, खुद्द मुंबईत ते झाले आहेत अल्पसंख्य. अल्पसंख्यांना कोण विचारतो? त्यांनी निवडणुकांवर बहिष्कार घातला तरी शिरजोर पक्षांचे काही अडणार नाही. आता सगळ्या मोठमोठ्या काँग्रेस विरोधी पक्षांना झोपडपट्टीनिवासी उप-या महाजनांचा लाखोगणती मतांचा हुकमी पाठिंबा सज्ज आहे. मोर्चे, बंद घेरे हव्या त्या तुफानासाठी आज हजारो उपऱ्यांच्या शेकडो टोळ्या हूं म्हणताच पक्षनेत्यांच्या दिमतीला हजर.
महाराष्ट्रातला मऱ्हाठा लौकिकी दृष्टया आज कितीही खालावलेला असला, तरी आजच्यासारखा अनेक प्रसंगातून तो शीरसलामत अनकेवेळा बाहेर पडलेला आहे. छत्रपती श्रीशिवरायाची मनोमन शपथ घेऊन एकजात मऱ्हाठा स्वाभिमानाने एकवटला, आजुबाजूच्या नाना रंगीढंगी राजकीय धर्माकडे स्पष्ट पाठ फिरवून महाराष्ट्र धर्माचा जिद्दखोर इनामी भक्त बनला, तर कसल्याही बिकट परिस्थितीचे पोलादी पाश तोडून, आपल्या पूर्व परंपरेला साजेशोभेशा दिमाखाने तो पुन्हाही मिरवू शकेल. समर्थ रामदास छातीवर हात ठेवून आपल्याला दिलासा देत आहेत. की शिवबाच्या म-हाठ्यांनो,
धीर धरा धीर धरा
हडबडूं गडबडूं नका
काळ वेखोनि वर्तावे
सांडावे भय पोटिंचे
मांजरासारखा घरगुती प्राणी, पण चोहोबाजूंनी आडवून कोणी त्याची छळणा करील, तर ते सुद्धा छळकांच्या नरडीचा घोट घेऊन आपली सुटका करून घेते आणि आपण म-हाठे तर इतिहासख्यात बिबळ्या वाघाची जात! वाघ शूर असतो, क्रूरही असतो, तसा डावपेच जाणणाराही असतो. पण तो म्हणे इतर जनावरांसारखा टोळीने राहात नाही. कशाला राहील? जरूरच काय? प्रत्येकाचा आत्मविश्वासच एवढा दांडगा की समोर हत्तीचे प्रचंड धूड का यीना, त्याचे गण्डस्थळ फोडण्याची त्याची एकट्याची हिंत असते.
युद्धाच्या चकमकीत गफलतीने शिरफ्दार केलेल्या तरण्याबांड दत्ताजी शिंद्यांच्या छातीवर हातात खंजीर घेऊन कुत्बशहा बसला नि त्याला विचारतो -`क्यौं बे दत्ताजी, क्या अभी तूं हमारे साथ लढेंगे?’ त्यावर दत्ताजी कडाडला - `हां हां शैतान, क्यों नहीं? बचेंगे तो औरभी लढेंगे.’ दत्ताजीच्या त्या उद्गारातच महाराष्ट्र धर्माचा तेख चमकला. मऱ्हाठ्यांचा दरारा दरारा म्हणतात तो हा असा असतो. ओघास आले म्हणून या दरा-याची एक ऐतिहासिक कथा सांगतो. उत्तर हिंदुस्थानच्या दौऱ्यावर थोरले बाजीरावसाहेब होते, तेव्हाची हकिकत. दिल्लीपासून सुमारे २५-३० मैलांवर पेशव्यांचा तळ पडला होता. रात्र पडल्यावर पाच सहा म-हाठे जवानांनी बेत केला. `आपण दिल्लीपासून इतक्या जवळ आलो आहोत तर एकदा पाहून तर येऊ बादशाही दिल्ली राजधानी कशी काय आहे ती. सकाळच्या हजेरीच्य़ा गजराआधी छावणीत दाखल झालो म्हणजे झाले. आहे काय त्यात?’ असे ठरवून ते स्वार दौडीने रात्रीच्या रात्री दिल्लीत घुसले. रात्रीची निहूप वेळ. दिल्लीच्या रस्त्यातून खाडखाड घोड्यांच्या टापा वाजू लागताच, कोतवाल चावड्यात एकच हाहाकार उडाला. `मरगठ्ठे आये, मरगठ्ठे आये’ लोकांची धावपळ सुरू झाली. बातमी वजिरापर्यंत आणि बादशहापर्यंत पोहोचली. खलबते चूला झाली. राजधानीवर बाजीरावसाहेब पेशव्यांनी असा एकाकी हल्ला का चढवावा? ताबडतोब वजिराला पेशव्याच्या छावणीकडे चौकशीसाठी रवाना केले. इकडे ते मऱ्हाठे जवान शहरात फिरायचे पाहायचे तेवढं पाहून, पहाट फुटण्याच्या आत छावणीत येऊन दाखलही झाले.
मागाहून वजिराचा लवाजमा पेशव्यांच्या मुलाखतीला आला. हकिकत ऐकून बाजीरावाला आश्चर्य वाटले, `आम्ही तर येथेच आहोत. राजधानीत घुसण्याचा प्रश्नच येतो कुठे?’ वजिराने दिल्लीत उडालेल्या धावपळीचा `आंखो देखा हाल’ सांगितला. चौकशी करता, वस्तुस्थिती समजली. समशेरी, भाला, ढाला, बर्चीवाले ५-६ म-हाठे घोडेस्वार ते काय, पण राजधानीत नुसते ते दिसताच, त्यांच्या कणगीदार पगड्यांनी दिल्ली उपडी केली. तेव्हापासून दिल्लीकरांनी मऱ्हाठ्यांची जी हैबत खाल्ली, ती आजदिन तागायत!
सध्याच्या लोकशाही जमान्यातही दिल्लीच्या कारभारात मऱ्हाठा मुत्सद्दी शिरला का हिंदुस्थान्यांच्या झोपा उडतात. डॉ. आंबेडकर, काका गाडगीळ, चिंतामणराव देशमुख यांच्या कारकीर्दीचा इतिहास तर तुमच्या आमच्या नजरेसमोरचा. न्यायनिष्ठूर कर्तव्यासाठी त्यांनी आपल्या थोर मंत्रिपदांनाही लाथाडले. याला म्हणतात महाराष्ट्र धर्माचा अभिमान आणि मऱ्हाठ्यांचा मराठबाणा. या थोर परंपरेची आपल्याला जिवाभावाने जपणूक करायचीआहे. पुनरुत्थानाचे मर्म येथेच आहे. जुन्या जमान्यात पाच सहा म-हाठे स्वार दिल्लीची पाचावर धारण बसवितात तर चालू जमान्यात महाराष्ट्रातला एकजात जातिवंत मऱ्हाठा एकदिली एकवटला, महाराष्ट्र धर्माचा एकनिष्ठ पासक झाला, श्रीशिवछत्रपतींची मनोमन शपथ घेऊन परिस्थितीवर मात करायला सज्ज झाला, तर तो इकडची दुनिया तिकडे करील. तशी त्याची परंपराच आहे. नवी दुनिया, नवे प्रश्न, नव्या अडचणी, नवे शत्रू, नवी राजवट सर्व काही अगदी टिपटॉप, नवीन असेल, तरीसुद्धा आमचा महाराष्ट्रधर्म नित्य, अगदी सनातन नवीनच आहे. दुनिय बदलो, काळ बदलो, सामाजिक राजकीया नीतीच्या व्याख्या बदलोत, १७व्या शतकाला महाराष्ट्र धर्म चालू २०व्या शतकातही महाराष्ट्राच्या पुनरुत्थानाला उचलून धरल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र धर्म म्हणजे काय? तो कसा आचरावा? कसा पाळावा? समर्थांच्याच शब्दात वाचा, सावकाश वाचा, नीट मनन करून वाचा, आपुलकीने विचार करा. समर्थ रामदास हात उभारून हाक देत आहेत –
मारितां मारितां मरावें ।
तेणे गतीस पावावे ।
फिरोन येता भोगावें ।
महद्भाग्य ।।
नजर करारी राखणे ।
कार्य पाहोन खतल करणे ।
तेणे रणशूरांची अंतःकरणे ।
चकित होती ।।
जैसा भांड्याचा गलोला ।
निर्भय भारामध्ये पडिला ।
तैसा क्षत्री रिचवला ।
परसैन्यामध्ये ।।
निःशंकपणे भार फुटती ।
परवीरांचे तबके तुटती ।
जैसा बळिया घालून घेती ।
भेरी उठता ।।
ऐसे अवघेचि उठता ।
परदळाची कोण चिंता ।
हरण लोळवी चित्ता ।
देखत जैसा ।।
मर्दे तकवा सोडू नये ।
म्हणजे प्राप्त होतो जय ।
कार्य प्रसंग समय ।
ओळखावा ।।
कार्य समजे ना अंतरे ।
ते काय झुंजेल बिचारे ।
युद्ध करावे खबरदारे ।
लोक राजी राखता ।।
दोन्ही दळें एकवटे ।
मिसळताती लखलखाटे ।
युद्ध करावे खणखणाटे ।
सीमा सांडुनी ।।
देश मात्र उच्छेदिला ।
जित्या परीस मृत्यू भला ।
आपुला स्वधर्म बुजविला ।
ऐसे समजावे ।।
मराठा तितुका मेळवावा ।
आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा ।
येविषयी न करिता तकवा ।
पूर्वज हासती ।।
मरणहाक तो चुके ना ।
देह वाचविता वाचे ना ।
विवेका होऊनि समजा ना ।
काय करावे ।।
भले कुळवंत म्हणावे ।
तेही वेगी हजर व्हावे ।
हजीर न होता कष्टावे ।
लागेल पुढे ।।
देशद्रोही तितुके कुत्ते ।
मारुनि घालावे परते ।
देशदास पावती फत्ते ।
यदर्थी संशय नाही ।।
देश मस्तकी धरावा ।
अवघा हलकल्लोळ करावा ।
मुलुखबुडवा का बुडवावा ।
धर्मसंस्थापनेसाठी ।।
विवेक विचारा सावधपणे ।
दीर्घ प्रयत्न केलाचि करणे ।
तुळजावराचेनि गुणे ।
रामे रावण मारिला ।।
अहो हे तुळजा भवानी ।
प्रसिद्ध रामवरदायिनी ।
रामदास ध्यातो मनी ।
यन्निमित्त ।।
जय महाराष्ट्र! जय भारत!!