टाकलेलं पोर
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
दुसऱ्या आवृत्तीविषयी
टाकलेलं पोर
(तीन अंकी पौराणिक नाटक)
लेखक
‘प्रबोधन’कार केशन सीताराम ठाकरे
प्रकाशक
बलवन्त पुस्तक भाण्डार
गिरगांव नाका, मुंबई नं. ४
आवृत्ती २ री
१ ऑगस्ट, १९४९
(पहिली आवृत्ती १९३९)
किंमत १।। रुपया
दुसऱ्या आवृत्तीचे प्रास्ताविक बोल
माझे नाट्याभिनय-कुशल दिवंगत स्नेही विठोबा झावबा यांच्या जिव्हाळ्याच्या खटपटीने, त्यांच्या चित्तरंजन नाट्य समाजाने हे नाटक मुंबई शहरात प्रथम ता. ५ मार्च सन १९३९ रोजी सकाळी ९ वाजता रॉयल ऑपेरा थिएटरात रंगभूमीवर आणले.
यापूर्वी सन १९३३ साली डेक्कन स्पार्क्स नाट्यसंस्थेने या गद्य नाटिकेच्या दोनच अंकाचा पहिला रंगी प्रयोग खानदेशातल्या फैजपूर मुक्कामी केला होता. या प्रयोगाच्या प्रसंगी तेथे घडलेली एक घटना नमूद करून ठेवण्यासारखी आहे. त्या वेळी यावल येथे माझे स्नेही रावसाहेब रामचंद्र हरि मिरजकर बी. ए., एलएल. बी. सबजज्ज असल्यामुळे तेथल्या सर्व वकीलमण्डळाचा नि इतर सरकारी अधिकाऱ्यांचा माझा स्नेह जमला, अर्थात टाकलेलं पोर नाटकाच्या पहिल्या मंगल प्रयोगाला येण्याचे मी सगळ्यांना निमंत्रण दिले. मिरजकरहि सर्व अधिकारी नि वकील मंडळी अगत्याने आली. थेएटरहि चिक्कार भरले, स्त्रीवर्गहि बराच आला होता. पडदा वर गेला. प्रयोग एकसारखा रंगत गेला, प्रेक्षकांनी फार वाहवा केली.
प्रयोग संपल्यानंतर निमंत्रित पाहुणे मंडळींना चहापान देण्याची गडबड चालली असताना, गावातले चारपांच लोक जमलेल्या एक दोन वकिलांना खुणा करून बाहेर घेऊन गेले. आस्ते आस्ते सगळेच वकील थेटराबाहेर कसल्यातरी गंभीर चर्चेत गुंतल्यासारखे दिसले, मामलतदार मुनसफ रजिस्ट्रार एवढ्याच मंडळीशी मी बोलत बसलो, बाहेर काय भानगड चालली आहे, याचा आम्हाला काही अंदाजच लागे ना. तेथल्या घोळक्यात लवकरच फैजपूरचे फौजदारहि सामील झालेले दिसले, थोड्याच वेळाने `चला चला निघा` असा बाहेरच्या वकील मंडळींचा निरोप येतांच, मिरजकरादि अधिकारी मंडळी उठली आणि सगळेजण लॉरीत बसून आमचा निरोप घेऊन परत यावलला गेले.
दुसरे दिवशी रविवारी दुपारी २ च्या सुमाराला यावलहून मिरजकरांचे तांतडीचे पत्र घेऊन एक इसम मोटार घेऊन मला यावलला नेण्यासाठी आला. `पत्रदेखत निघून यावे` एवढाच मजकूर त्या चिठ्ठीत होता.
यावलला पोहोचतांच एका शृंगारलेल्या सार्वजनिक दिवाणखान्यात माझा प्रवेश झाला. अधिकारी, वकील मंडळी आणि नागरीक तेथे थाटाने बसले होते. पानसुपारीची तबके, अत्तर गुलाब, हार तुरे वगैरे थाट होता. सर्वांच्या वतीने मुनसफ मिरजकर यांनी माझे स्वागत करून एका प्रमुख ठिकाणी बसवले, शेजारीच मसूरकर महाराजांच्या संप्रदायातले एक संन्याशी बसले होते. हे काय प्रकरण आहे, याची मला काही अटकळच होईना!
इतक्यात एक नवविवाहित जोडपे दिवाणखान्यात आले. "हां, पडा आधी यांच्या पायां" असे संन्यासीबुवांनी सुचविताच, त्या वधूवरांनी माझ्या पायांवर आपापली मस्तके ठेवली. संन्यासी म्हणाले, - "ठाकरेसाहेब, हा आपल्या टाकलेलं पोर नाटकाच्या प्रयोगाचा शुभमंगल परिणाम; द्या वधूवराला आशीर्वाद." मी आशीर्वाद दिला; पण अचंब्यात पडलो, नंतर पानसुपारी अत्तर गुलाब हार तुरे समारंभ आटोपल्यावर, जमलेल्या मंडळींनी सगळा खुलासा केला. तो असा--
फैजपुरातल्या भावसार समाजातली एक अविवाहित तरुणी गरोदर असल्याचे उघडकीला आले. जमातीत चर्चा चिकित्सा चालू झाली. मुलीला घराबाहेर काढली नाही तर बापावर बहिष्कार घालण्याच्या जमात-पंचांच्या धमक्या चालू झाल्या, एका भावसार तरुणाने धिटाईने पुढे येऊन, `माझे तिचे जमले आहे, माझ्यापासूनच ती गर्भवति आहे, आमचे लग्न लावून टाका नि तंटा मिटवा` असे सगळ्यांना पुकारून सांगितले. पण नाक्षर नि अडाणी जगात-पुढाऱ्यांना ते पटे ना. मुलीला आधी घराबाहेर घालवा, मग पुढचे पुढे, एवढाच त्यांचा हट्ट, तेवढ्यात तेथला एक तरुण मुसलमान गुंडहि पुढे झाला आणि म्हणू लागला की त्या तरुणीचा नि त्याचा संबंध आहे. ती घराबाहेर पडतांच निका लावायला तो तयार आहे. फैजपूरच्या मुसलमान मंडळींनीहि तसा जोर धरला. मुलीचा बाप गांगरून गेला, पंचाच्या कटकटीला कंटाळून त्याने अखेर त्या मुलीला घराबाहेर हाकलली. चटकन त्या भावसार तरुणाने तिला आपल्या घरी नेऊन ठेवली.
`घराबाहेर घालवा` असा निकाल देऊन पंचमंडळीतले चार पाच इसम, तापलेले डोके थंड करण्यासाठी, टाकलेलं पोर नाटकाचा प्रयोग पहायला थेटरात पिठावर बसले. नाटक पहातांच त्यांचे माथे ताळ्यावर आले. आपण केली ती मोठी घोडचूक केली. महापाप केले. आता ते निस्तरायचे कसे? ते अगदी बेचैन झाले. थेटरात यावल तालुक्यातले सगळेच मोठमोठे वकील आयतेच आलेले पाहून, त्या पंचानी आपली भानगड त्यांना सांगितली नि हे पाप कसे निस्तरायचे, याचा सल्ला विचारला.
वकिलांनी प्रथम फौजदाराची मदत घेऊन त्या तरुण जोडप्याला आपल्या ताब्यांत घेतले आणि पंचासह सगळेजण मोटारलॉरीत बसून यावलला गेले. तेथे मसूरकर संन्यासी आणि इतर यावलकर शास्त्रीमंडळींचा सल्ला घेऊन त्या जोडप्याचे सार्वजनिक खर्चाने आणि थाटाने सकाळीं ९ वाजतां वैदिक विधीनें लग्न लावून टाकले आणि नाट्यप्रयोगाच्या परिणामाचे श्रेय जाहीर रीतीने स्वीकारण्यासाठी मला तेथे बोलावून नेले. मला केवढा आनंद झाला असेल? माझ्या डोळ्यांतून घळघळा आसवें वाहू लागली! ज्या मंडळींनी हे कार्य घडवून आणले, त्या सर्वांच्या पायांवर मस्तक ठेवण्याच्या निश्चयाने मी उठलो. पण मसूरकर बुवांना प्रणाम केला म्हणजे आम्हा सगळ्यांना तो मिळाला, असा पुकारा झाल्यामुळे मी त्या संन्यासी महाराजांच्या चरणांवर मस्तक ठेवले. टाकलेलं पोर नाटकाच्या पहिल्याच जाहीर प्रयोगाचा हा असा इतिहास घडलेला आहे.
चित्तरंजन नाट्यसमाजाने पंधरा-वीस प्रयोग केल्यानंतर, लालबाग परळचे काही हौशी क्लब मधूनमधून दामोधर हॉलमध्ये याचे प्रयोग नेहमीच करीत असतात. मागासलेल्या पण महत्वाकांक्षी समाजातल्या नाट्यप्रेमी मंडळींना कर्णासारख्या धनुर्धराच्या चरित्राची विशेष चटक लागावी, हे साहजीकच आहे. मराठी रंगभूमीला मर्त्य पृथ्वीवरून स्वर्गीय ऐश्वर्याचे आनंदसाम्राज्य देण्यासाठी आपल्या कलावंत जीवनाचे पापड भाजणाऱ्या पांढरपेशा शहरी शहाण्यांनी काय म्हणून या नाटकाची दखल घ्यावी?
त्यात पाश्चिमात्य इबसनी तंत्र नाही किंवा शॉचे मंत्रहि नाहीत. परशरामपंती वेणीसंहार नाटकाच्या घाटणीवर लिहिलेले जुन्या दिखामाचे हे नाटक! तशात ते ठाकऱ्यांचे! असणार काय त्यात शिव्यांशिवाय आणखी? शुद्ध सात्विक पवित्र ओव्यांचेच आमरण सुस्कारे सोडीत जगणाऱ्या शहरी नि संभावीत नाट्योत्कर्ष-साधकांना या नाटकात काही राम दिसला नाही, तरी गिरण गावातल्या बहुजनसमाजातल्या भगिनी बांधवाना माझ्या टाकलेल्या पोराने चांगलीच चटक लावली आहे, यातच मी धन्यता मानतो. त्यांच्याच विचार-क्रांतीसाठी मूळ मी हे लिहिले.
बलवन्त ग्रंथ भाण्डाराचे मालक स्नेही महाशय परचुरे यांनी स्वयंस्फूर्तीने या दुसऱ्या प्रकाशनाचे कार्य आंगावर घेतले, याबद्दल मी त्यांचा खरोखरच फार आभारी आहे.
महाराष्ट्राचा नम्र सेवक,
केशव सीताराम ठाकरे
जोशी बिल्डिंग,
रानडे रोड एक्सटेन्शन, मुंबई २८.
ता. १ ऑगस्ट सन १९४९
पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना
महाभारत महाकाव्याचा चिकित्सक स्वाध्याय करीत असताना, त्यातल्या कर्णाच्या भूमिकेने मला चटका लावला होता. तशातच सन १९३० सालीं कर्जत (जि. कुलाबा) मुक्कामी महाराष्ट्र नाटक मण्डळीचा कै. शिवरामपंत परांजपेकृत पहिला पांडव नामक नाटकाचा प्रयोग पहाण्याची संधि लाभली. कर्णासारख्या उदारचरित पुरुषोत्तमाचे कथानक आणि शिवरामपंत परांजप्यासारखा तर्ककुशल रसाळ लेखक! फार मौज अनुभवायला मिळाले, अशा आशेने मी नाटकाला गेलो, पण--
निराशेने नि संतापाने घरी परत आलो. इतक्या अर्कट `भटो` वृत्तीने कर्णचरित्राची विटंबना शिवरामपंतासारख्या स्वाभिमानी नि स्वदेशाभिमानी माणसाला करवली तरी कशी? याचा अजूनहि मला अचंबाच वाटत आहे. `मला कोणीतरी क्षत्रिय म्हणा हो` असे प्रत्येकाला आळवीत रडणारा आणि अभिमन्यूचे भूत पाहताच भेदरून बोबडी वळलेला कर्ण महाभारतात तरी खास आढळणार नाही. मग असला रडका भेदरट कर्ण कल्पनेच्या कुंचल्याने रंगवण्यात, लेखकाला कोणत्या चळवळीवर काळ्या शाईचे शिन्तोडे उडवायचे होते, हे महाराष्ट्र नाटक मण्डळीच्या धांदरट बावळट चालकांना जरी समजले नाही, तरी जाणत्यांनी त्या टिंगलीचा वा बदनामीचा ठाव तेव्हाच घेतला होता. या बदनामीच्या निषेधार्थ प्रस्तुत नाटकात कर्णाच्या तोण्डी मी घातलेले उद्गार, खुद्द नाटकात योग्य स्थळ न मिळाल्यामुळे मी बाजूला काढून ठेवलें होते. ते याच ठिकाणी उमटून ठेवण्याची संधि मी साधीत आहे.
कर्ण-- मला पहिला पाण्डव ठरविण्याचा उपद्व्याप करणारे काही पण्डित माझ्या बीजशुद्धीचं संशोधन करण्याच्या दिमाखानं, मी माझ्या हीन कुलाबद्दल फार खंति करीत असतो, लाजेनं व्याकूळ होत असतो, मनातल्या मनात झुरत असतो, रात्रन् दिवस एकांती रडत असतो, अशा बदनामीची नाटकं रंगवण्यात दंग असल्याचं माझ्या कानी आलं आहे. पाण्डवपक्षपाती भाटांचा हा कट मी ओळखून आहे. असल्या मतिमन्दांना या कर्णाच्या चारित्र्याचा नि आत्मविश्वासाच्या कमावणीचा रतिमात्र ठाव उमगलेला नाही, इतकंच मानून मी तिकडं दुर्लक्ष करीत असतो. डबक्यांतल्या बेडकांनी महासागरातल्या देवमाशाच्या चारित्राची कहाणी सांगण्याचं धाडस करू नये आणि परोपजीवी बांडगुळांनी स्वयंप्रभावी पुरुषाच्या पौरुषत्वाचा ठाव घेण्याचा दिमाख मिरवू नये."
`पहिला पाण्डव` नाटकाची भाषा नि रचना नीट पाहिली तर मात्र असे स्पष्ट दिसते, की काळकर्ते परांजपे यांच्या नावाचा दुरूपयोग करून अनेक अलबत्या गलबत्या लेखकांनी हे भारूड महाराष्ट्र नाटक मण्डळीच्या गळ्यात बांधले आणि त्या वेंधळ्यांनी कै. शिवरामपंताची ही ढोबळ बदनामी बिनदिक्कत रंगभूमीवर नाचवली.
टाकलेलं पोर या नाटकात अपत्यहत्त्येचा प्रश्न तर प्रधान आहेच आहे. पण त्याहिपेक्षा, मागासलेल्या नि पददलित समाजातील स्वाभिमानी उद्धारकांना आत्मोन्नतीचे शिखर गाठण्यासाठी कसकसल्या सामाजिक विकल्पांना नि अडचणींना तोंड देऊन आपला मार्ग आक्रमावा लागतो, याचे दृश्य रंगवण्याचा कर्णाच्या मूळ कथेनुसार मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
हिन्दुजनांची सामाजिक आचारविचारक्रांति आज विसाव्या शतकाच्या मैदानावर येऊन थडकली, तरी अपत्यहत्त्येच्या पापाला बसावा तसा आळा अजून बसत नाही. कुमारी नि विधवा यांना फूस लावून फशी पाडणारे, इतकेच नव्हे तर इं. पि. कोडाच्या ३१२ कलमान्वयें त्यांना फासावरहि लटकवायला कारण होणारे नराधम बिनशर्त बिनबोभाट मोकळे नि नामानिराळेच राहतात आणि त्या अभागणी जन्मठेपीची किंवा मुदतबन्द सक्तमजुरीच्या शिक्षेला जाऊन माणसांतून उठतात. या अन्यायाविरुद्ध विधीनिषेध नाटिकेने मी हिन्दुमत जागृत करण्याचा अट्टहास केलेला आहेच. प्रस्तुत नाटकाने अपत्यहत्त्येच्या पापाबद्दल खुद्द स्त्रियांचीच विचारक्रांति करण्याचा यत्न केला आहे. तो कितपत साधला आहे, हे रसिकांनीच ठरवलेले बरे.
पहिल्या अंकाचा पहिलाच प्रवेश कै. परशुरामपंत गोडबोले यांच्या सुप्रसिद्ध मऱ्हाठी `वेणीसंहार` नाटकांतल्या एका उत्तम प्रवेशाची सुधारलेली आवृत्तीच असल्यामुळे त्यांचे काही श्लोक नि आर्या मी जशाच्या तशाच नकलल्या आहेत, हे कृतज्ञपणे सांगणे अगत्याचे आहे. वेणीसंहारासारखी जुनी नाटके आता रंगभूमीला कायमची मुकल्यामुळे, जुने ते सारे सोने न मानणाऱ्या आधुनिकांना जुन्यातहि काही सोने असते, एवढेच या प्रवेशाने मला दाखवायचे आहे.
सर्वांचा नम्र सेवक,
केशव सीताराम ठाकरे.
मुंबई, ता. ५ मार्च १९३९
अंक १ ला
प्रवेश १ ला
[स्थळ, स्थिति व पात्रें : सम्राट दुर्योधनाचे शिबीर, द्रोणाचार्यांचा वध झालेला आहे. नवीन सेनापतीच्या निवडणुकीचा प्रश्र. दुर्योधन व शल्य बोलत प्रवेश करतात.]
शल्य: जयघोष चालले आहेत! पाण्डवांच्या छावणीत जयघोष चालले आहेत! द्रोणाचार्यांच्या अधर्म वधाची शरम वाटण्याऐवजी, याना जयघोष सुचतात अं? राजा, भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांच्यासारखे, त्रैलोक्याला भारी, असे आपले दोन सेनापति पाण्डवांच्या कपटनीतीला बळी पडले. आम्ही युद्धधर्माचे नियम कडकडीत पाळावे आणि या पाण्डवांनी मात्र हवी ती कपटयोजना करावी?
दुर्योधन : शल्या, श्रीकृष्ण यादवासारखा मसलती मुत्सद्दी, पाण्डवांच्या भल्याबुऱ्या वर्तनाचा जोंवर पुरस्कार आहे तोंवर त्याच्याकडून धर्मयुद्धाची अपेक्षा करणं चुकीचं आहे.
शल्य० : युधिष्ठिरासारख्या सत्यव्रत महात्म्यानंसुद्धा, धडधडीत खोटं बोलून आपल्या शीलावर रखरखीत निखारे ओतावे? छे! आता वाकड्या दाराला वाकडी मेढ ठोकल्याशिवाय गत्यन्तरच नाही.
दुर्यो० : शल्या, तूं पाण्डवांचा मामा; तेव्हा क्षात्रधर्माच्या तोण्डाला कोळसे फासणाऱ्या तुझ्या भाच्यांची ही दगलबाजी पाहून, कौरवांचा पुरस्कार केल्याबद्दल तुला थोडेतरी समाधान वाटत असेल खास!
शल्य : राजा, या घडीचा प्रश्न हा नव्हे. प्रश्न इतकाच आहे कीं श्रीकृष्ण यादवाच्या मसलतीनं कपटी डावपेच लढवणाऱ्या पाण्डवांशी आम्ही सरळ धर्मयुद्धाचा सामना द्यावा, का शठ्यप्रति शाठ्यम् चे टोले लगावून, खोट्याच्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव घालावा?
दुर्यो० : शल्या, कपटनीतीनं मिळणारा विजय या दुर्योधनाला मुळीच नको. युद्धाला तोंड लागलं कीं यशापयशाच्या प्रश्नाला काही महत्त्वच उरत नाही. क्षात्रधर्मानुसार कोण कसा न् किती कसोशीनं लढला, यातच श्रेयाचं सारं महत्त्व आहे. साऱ्या कौरवांचा संहार झाला, तरी या श्रेयाला पारखे होण्याची माझी मुळींच इच्छा नाही. आधींच व्यासासारख्या पोटाळ पंडितांना हाताशीं धरून, यादव कृष्णानं कौरवांविरुद्ध लोकमताची आग चांगलीच भडकावून ठेवली आहे.
शल्य : या सगळ्या क्षत्रिय-संहाराला हाच नाटक्या कारण आहे. दाणे टाकून कोम्बडे झुंजवायची याला फार खोड; पुन्हा आपण मात्र नामानिराळा! पाण्डवांनी देव देव म्हणून याचा उदोउदो करावा आणि या पाताळयंत्री डोम्बाऱ्याने, लोकमताच्या भुलभुलावणीवर, स्वतःचं माहात्म्य थाटून घ्यावं. असा हा साट्यालोट्याचा कारखाना आहे.
दुर्यो० : पाण्डवानी आणि लोकांनी माजवलेलं कृष्णाचं हे स्तोम, आम्ही कौरवांनी कधीच मान्य केलं नाही ; म्हणून आमच्यावर त्यानी लोकमताची कुत्रीं भुंकायला सोडली. सत्याच्या न् धर्माच्या वल्गना थकल्यावर, "स्वराज्य आमचा जन्मसिद्ध हक्क; त्यासाठी हे महायुद्ध" अशी नवीन हाकाटी आता चालली आहे. वास्तविक शल्या, पाण्डव जन्मापूर्वीच पण्डुराजानं राज्यसंन्यास करून वनवास पत्करला. हे कुन्तिपुत्र पाण्डव नियोगाची सन्तति. यांना राज्यावर हक्क सांगतांच येतो कसा? तरीही आमच्या विरोधांना न जुमानता, धृतराष्ट्र महाराजांनी यांना खाण्डवप्रस्थाच्या राज्याची देणगी देऊन, आपलं बन्धुप्रेम व्यक्त केलं आणि यांच्या खऱ्याखोट्या जन्मसिद्ध स्वराज्याची तक्रार मिटवली. यादव कृष्णाच्या भगतांकडून याबद्दल चुकूनसुद्धा आम्हाला दुवा मिळाला नाही. आमच्या मेहरबानीची ही देणगी, त्यांनी हक्काच्या सदरात खेचलीं, चोर तर चोर आणि वर शिरजोर!
शल्य : फुकटाफाकट मिळालेलं ते स्वराज्य त्या जुगारी धर्मानं जुगारांत पणाला लावून दोनदां गमावलं.
दुर्यो० : तरीहि पुन्हा तोण्ड वर करून आमच्याशी तण्टा आहेच. या भेकडांना जुगार खेळण्याची तर मोठी आग, पण प्रतिपक्षावर मात करण्याच्या अकलेचा पुरा खडखडाट! स्वराज्य आणि सर्वस्व जुगारीत पणाला लावणाऱ्या माथेफिरू जुगाऱ्यांच्या धर्मनिष्ठेची आणि राजकारणी अकलेची फक्त कृष्णपंथी मूढांनीच तारीफ करावी!
शल्य : स्वतःच्या व्यसनापायीं राज्याचा न् प्रजेचा, खाजगी मालमत्तेसारखा विक्री करणान्या पाण्डवांचा हा जुगार भारतीय नृपनीतीच्या कल्पनेला कीड लावल्याशिवाय राहणार नाही. पण राजा, हव्या त्या वाममार्गांनी तुझे दोन सेनापति पाण्डवांनी ठार केले. तरी सैतानावर संतान सोडण्याची बुद्धि तुला होत नाही, तुझ धोरण चुकत आहे.
दुर्यो० : ते कसे काय?
शल्य : बापाच्या अधर्म वधानं नखशिखान्त खवळलेल्या अश्वत्थाम्याला डावलून, कर्णासारख्या सूतपुत्राला कौरवांचा सेनानी करण्याचा तुझा विचारस्पष्टोक्तीची क्षमा कर-मला चतुराईचा दिसत नाही.
दुर्यो० : चतुराईचा दिसत नाही?
शल्य : मुळींच नाहीं. पाण्डवांनीं द्रोणाचायांचा कपटाने घात करताच त्या खवळलेल्या अश्वत्थाम्यानं नारायणास्त्र सोडून, पांचाळांची केवढी दाणादाण उडवून दिली. ते तू प्रत्यक्ष पाहिलंस ना? पाण्डववधाच्या तिरमिरीनं भडकलेल्या त्याच्या त्वेषाग्नीत सेनानिपदाच्या उत्तेजनाचं तेल ओतण्याचा धोरणीपणा अजूनही दाखवशील. तर उद्याचा सूर्य अस्ताला जाण्यापूर्वीच, ही वसुन्धरा नि:पाण्डवी झालेली पाहाशील.
दुर्यो० : शल्या, स्वार्थी जिव्हाळ्याच्या चकमकीनं चेतलेला क्रोधाग्नि, नवपरिणत दाम्पत्याच्या कामाग्नीसारखाच अल्पप्रभावी असतो. अस्त्रसागर द्रोणाचार्यांचा पुत्र-वीरमणि अन्वत्थामा-कितीहि पराक्रमी असला, तरी त्याची आजची सन्ताप-सौदामिनी पितृवधाच्या स्वार्थी तिडकेनं कडाडली असल्यामुळे तिच्या या तात्पुरत्या न् तात्कालीक कडकडाटावर भाळून आपलं भागणार नाही. शिवाय शल्य, आणखीहि थोडा विचार करशील, तर सेनानीपदासाठीं केलेल्या कर्णाच्या योजनेचे महत्त्व तुला तेव्हाच पटेल.
शल्य : राजा, भीष्मद्रोणाच्या पाण्डव-पक्षपाताबद्दल तुला काही शंका आली की काय?
दुर्यो० : तशी शंका तर मला आलीच आहे, पण विशेषतः द्रोणाचार्य झाले काय, किंवा अश्वत्थामा झाला काय. त्यांनीं बाह्यात्कारी जरी क्षत्रियाचा पेषा पत्करला असला, तरी त्याच्या आवरणाखाली त्यांची ब्राह्मणी पिण्डप्रकृति धमधमत आहे, ही गोष्ट नजरेआड करून मला भागणार नाही. मूळचा स्वभाव सुटत नाही म्हणतात, ते अक्षरशः खरं आहे. पुत्रवधाच्या नुसत्या बातमीनं आचार्यांचं अंतःकरण शोकमोहानं व्याकूळ होताच, तात्काळ त्यांनी कडव्या क्षात्रधर्माचा न् शस्त्राचा संन्यास करून. बाह्मणस्वभावाला शोभेसा मनाचा मवाळपणाच अखेर स्वीकारला ना?
शल्य : होय, ही गोष्ट मला पटली. पण अश्वत्थाम्यानं मात्र आपला क्रोधाग्नी भडकवून क्षात्रतेजाची बूज राखली ना? मग त्याच्या त्या तेजस्वी संतापाचा फायदा तू घेऊ नयेस?
दुर्यो० : संताप? मद्रराज, ब्राह्मणाचा सन्ताप नेहमी स्वार्थी न् बहिर्मुख असतो; क्षत्रियांप्रमाणं व्यापक न् अन्तर्मुख नसतो. त्यांच्या स्वार्थाची भूक भागली की सन्तापाची आग शमलीच! मग त्यांना कोणत्याहि कार्याचं महत्त्वच वाटत नाही. अशा वृत्तीच्या अश्वत्थाम्यापेक्षा आज सतत तेरा वर्षें कौरवांशी बिनतोड निष्ठेनं वागणाऱ्या महारथी कर्णाची सेनानीपदासाठीं मी केलेली योजनाच दूरदर्शीपणाची आहे, असं नाही का तुला वाटत? शल्या—
हा प्राकृत पुरुष नव्हे सांगावें काय म्या तुला कविला ।
कणाच्या तेजें बहु वीरांकरवीं स्वगर्व टाकविला ॥ १ ॥
[खवळलेला अश्वत्थामा प्रवेश करतो.]
अश्वत्थामा : राजा, कर्णासारख्या सूतपुत्राला राजनिष्ठेचं प्रशंसापत्र देऊन तू केवळ माझाच नव्हे, तर माझ्या स्वर्गवासी पित्याचाहि घोर अपमान व्यक्त करीत आहेस. अरेरे! कौरवांच्या मिठाला जागून, गेल्या पाच दिवसात, माझ्या पित्यानं पांचालसेनेला दे माय धरणी ठाय केलं आणि अखेर-अखेर-कृतघ्न राजा, श्रीकृष्णाच्या कपटनीतीनं त्याचा अधर्मवध सुद्धा झाला, तरीही आमच्या राजनिष्ठेची तुला शंकाच अं? धि:कार असो या कौरवांच्या क्षुद्र मनोवृत्तीला!
दुर्यो० : अस्वत्थामन् परमपूज्य द्रोणाचार्यांच्या अधर्म वधानं माझ्या हृदयांत पाण्डव-निःपाताचा केवढा ज्वालामुखी भडकलेला आहे. याची तुला कल्पना करून देण्यासाठीं मला माझं हृदयच फाडून दाखवावं लागेल! गुरुपुत्राच्या सेनानिपदाच्या लायकीची या दर्योधनाला स्वप्नातसुद्धा कधी शंका आलेली नाही आणि यापुढं ती कर्धी येणारहि नाही. कौरवेश्वराच्या सार्वभौम सामर्थ्याच्या प्रभावळींत, कर्ण, शल्य. अश्वत्थाम्यासारखे अनेक रथी महारथी आपल्या देदिप्यमान् तेजानं चमकत आहेत, या एकाच आत्मविश्वासाच्या जोरावर मी या भारतीय महायुद्धाच्या समुद्र-मन्थनाला हात घातला आहे. गुरुबन्धो, पितृवधाच्या सन्तापानंच कौरवांवर क्षुद्र मनोवृत्तीचा आरोप करायला तुझी विवेकबुद्धी या घडीला धजली म्हणायला काही हरकत नाहीं.
अश्व० : कां धजूं नये? राजा, कां धजूं नये? अरे –
प्रायोपविष्ट गुरु द्रोण । असतां केलें मालिखण्डण ।
कोण्ही न केलें त्याचें वारण। धिःकार धिःकार सर्वातें ॥ १ ॥
सर्वासमक्ष क्रूर हिंसन करूनि चालिला धृष्टद्युम्न ।
सुखें करितसा शिविरा गमन । कैसें तुम्हां पाहावलें ॥ २ ॥
कौरवेश्वरा, तुझ्या डोळ्यासमोर हा प्रकार घडावा? छान-छान, फार छान गुरुभक्ति दाखवलीस?
[ कर्ण प्रवेश करतो ]
कर्ण : यांत गुरुभक्तीचा प्रश्नच कुठं आला? भारतीय महायुद्धाचा सेनापतीच जिथं शस्त्रसंन्यासाला प्रवृत्त झाला तिथं इतरांनी काय करावं?
अश्व० : काय करावं? लाज वाटत नाही हा प्रश्न विचारायला?
कर्ण: खऱ्या गोष्टी उघड बोलायला लाज कसली? गुरूनं आपलं क्षात्रधर्माचं गुरुत्त्व लाथाडून, साध्यासुध्या संसाऱ्यालाच शोभेल, अशा ब्राह्मणी हृदयाचं लघुत्त्व ऐनप्रसंगी प्रगट केलं. तर त्या अवसानघाताबद्दल जबाबदार कोण? अर्थात् ज्याचा तो! भारतीय महायुद्धाचे मुकाबले, मोहाच्या किंचित् झळीनं वितळणाऱ्या सात्त्विक ब्राह्मणी पिण्डासाठीं खास नव्हत!
अभ्य० : ब्राह्मण मनोवृत्तीची निन्दा? राजा ही मला क्षणभरसुद्धां सहन होणार नाही.
कर्ण: क्षात्रधर्माचं भाडोत्री कवच फेकून देऊन हातीं दर्भसमिधा घे, म्हणजे तुझ्या जन्मजात ब्राह्मण्याकडे ढुंकून पाहाण्याचीसुद्धां आम्हांला जरूर पडणार नाही. पण मिजास क्षत्रियाची आणि करणी ब्राह्मणाची, या सरडेशाहीनं महायुद्धाचा झाला इतका विचका आतां पुरे झाला.
अश्व० : काय? महायुद्धाचा विचका आम्हीं केला?
कर्ण : तूं नाही तुझ्या बापानं केला, पांच दिवस झुंजला, पण एक पाण्डवसुद्धां ठार मारता आला नाहीं! म्हणे शापादपि शरादपि!
अभ्य०: हरामखोरा, माझ्या बापाची निन्दा? कल्पान्त करीन. राजा, या कर्णाच्या टकळीला लगाम घाल.
दुर्योo: अंगराज, भूतकाळाच्या गोष्टींचा नसता वितण्डवाद कशाला? भविष्यकाळाकडे नजर देऊनच वर्तमानकाळाचें कर्तव्य आपल्याला चोख बजावलं पाहिजे.
शल्य० : म्हणूनच भी म्हणतो, राजा, तातवधानं असो किंवा कशानंहि असो, अस्वत्थाम्याच्या या प्रक्षुब्ध शौर्य सागराचा आत्तांच सदुपयोग करून घे. यांतच तुझ्या संगरकुशलतेची सिद्धी आहे. द्रोणाचार्यांच्या मागं कौरव सैन्याचं आधिपत्य आपल्या शिरावर घ्यायला, अश्वत्थामाच सर्वतोपरी योग्य आहे. निःपाण्डवी पृथ्वी करायला या योजनेसारखं दुसरं अस्त्र नाही.
अश्व० : अलबत्, राजा या महासंग्रामाचा भार तूं माझ्यावर टाक, म्हणजे—
राजा आजचि अ-केशव। त्रिभुवन करीन अपाण्डव ।
सोमक पांचाळांचं नांव । शेषमात्र राहील ॥ १ ॥
दाऊनिया शौर्यधाटी। महावीरांचीया थाटी ।
संपवीन संग्राम गोष्टी ।आजि सर्वासमक्ष ॥ २ ॥
पाणी पाण्डवांनो---
ज्या ज्या शस्त्रधरीं तुम्ही नृपशुंनीं दुष्कर्म आरंभिलें ।
केलें या अनुमोदिलें दुरुनियां दोषास या पाहिलें ।
त्यांचीं भीम-किरीटिं-कृष्ण-सकटां काढोनि मांसें पहा ।
देतों मी सकळां दिशांस बळि हें मत्कर्म आतां सहा ॥ १ ॥
कर्ण : वाहवा-वाहवा! केवढा हा ब्राह्मणी वल्गनांचा गडगडाट! ब्राह्मणांचं सारं शौर्य त्यांच्या जिभलीच्या पट्ट्यांत सांठवलेलं असतं म्हणतात ते काही खोटे नाही! बापाला जे पांच दिवसात साधलं नाही ते हे चिरंजीव एका दिवसात करून दाखवणार! ब्राह्मणी धर्मानं असले मुकाबले पार पडते तर क्षात्रधर्माचा जन्मच कशाला झाला असता?
शल्य : नीच कुलोत्पन्ना कर्णा, स्वतः च्या पायांखाली काय जळत आहे तें पहा न् मग ब्राह्मणांच्या शौर्यवीर्याची चिकित्सा कर.
कर्ण : नादान क्षत्रियच काय ते बोलभाण्ड ब्राह्मणांच्या आशीर्वादावर क्षात्र पेषाचा डौल मिरवतात आणि क्षात्रवृत्तीचा रंग चोपडलेले भटजी अखेर ऐन अवसानांत, भर समरांगणावर, समाधीचा सोहळा साजरा करतात.
अश्व० : नीच सूतपुत्रा, अधमाधमा, तुझ्यासारख्या रथकार कुलोत्पन्नाला तरी क्षात्रवृत्रीची एवढी मिजास कशानं आली?
कर्ण: स्वभावजन्य गुणकर्माच्या पुण्याईनं समजालास?
अश्व० : शूद्रातिशूद्र रथकाराला कसली आली गुणकर्माची पुण्याई?
दुर्यो० : आचार्यपुत्राला असलं विधान मुळींच शोभत नाही. त्रैवर्णिकांच्या गुणकर्माच्या सनदा ब्राह्मणांकडून घ्यायच्या नसतात; त्या स्वभावजन्यच असतात. म्हणूनच आचार्य जन्मानं ब्राह्मण होते तरी कर्मानं क्षत्रिय म्हणूनच धारातीर्थी मोक्षाला गेले ना? अंगराज कर्णाच्या क्षात्र पराक्रमाचा जिवन्त इतिहास साऱ्या जगाचे डोळे दिपवित असतां, त्याला सूतपुत्र म्हणून हिणवण्यात अर्थ काय?
कर्ण: राजा, अश्वत्थाम्यानं सूतपुत्र म्हणून माझा मोठा सन्मान केला, असं मी समजतों.
सूत किंवा सूतपुत्र कोणी तरी असेन भी ।
दैवाधीन कुलीं जन्म, मनगटाधीन पौरुष ॥ १ ॥
दुर्यो० : सत्य आहे. मनुष्याचा पराक्रम त्याच्या जन्मावर, जातपातीवर किंवा कुळाच्या लौकिकी उच्च-नीचपणावर मुळीच अवलंबून नसतो.
कर्ण : राजा, वंशकुलाची बेगडी पुण्याई नामर्द षण्ढांना न् बोलभाण्ड ब्राह्मणांना; मला नाहीं. जन्म न् कुल या अपघाताच्या गोष्टी. असल्या अपघातांची महति, अश्वत्थाम्या, तुझ्यासारख्या जन्माभिमानी ब्राह्मणाला आणि असल्या भटाब्राह्मणांच्या पोकळ स्तुतिपाठानं फुगणान्या नामधारी क्षत्रियाना, मला नाही. या कर्णाचा पराक्रम न् त्याच्या क्षात्रचारित्र्याची थोरवी, या-या टरारलेल्या मनगटांत सांठवलेली आहे. क्षत्रियत्वाची लटकी घमेण्ड मारणाऱ्या ब्राह्मणपुत्रा, सूतपुत्र असा तूं माझा कितीही उपहास केलास, तरी माझ्या सूतकुलाचा मला मोठा अभिमान वाटत असतो, हे नीट ध्यानांत ठेव.
शल्य० : गर्दभाला उकीरड्याचाच मोठा अभिमान!
अभ्य० : तसा या सूतपुत्राला आपल्या सूतकुलाचा वाटत आहे.
कर्ण : का वाटू नये? कुलाचा अभिमान नाही, त्या माणसानं जन्मून तरी काय केलं? शिन्दळीच्या पोटी यद्दच्छेनं जन्माला येणाऱ्या पुरुषानं सुद्धां. आपल्या कुळाचा अभिमान धरून, त्याच्या उद्धारासाठी आत्मतेजाच्या पराक्रमाने साऱ्या दुनियेचे डोळे दिपवून टाकले पाहिजेत. दगलबाजीने व्यवहारांत वरचढ बनलेल्या तुमच्यासारख्या सत्ताबाजांनीच कुलांचा उच्चनीचपणा ठरविण्याचें कारस्थान केल्यामुळे, लक्षावधि समाजांच्या माणुसकीचा उकीरडा होऊन बसला आहे आणि या उकीरड्यावर आपल्या जन्मदत्त आत्मस्तोमाचा बाजार थाटणारे गब्रूच वास्तवीक " गाढव " संज्ञेला विशेष पात्र समजले पाहिजेत.
अश्व० : जाती तशी पुती न् खाण तशी माती, हा सनातन सिद्धान्त, उर्मट कर्णा विसरूं नकोस.
कर्ण : जन्मप्राप्त थोरवीवर जगणाऱ्या बड्या बापांच्या बड्या बेट्यांसाठीचं हा सिद्धान्त निघालेला आहे; मनगटाच्या जोरावर स्वतःचा न् स्वकुलाचा उद्धार करणाऱ्या आत्मतेजस्वी वीरांसाठी मुळींच नाही, हें तूं पण विसरू नकोस. या अधिरथ-राधा-पुत्राला अंगाधिपति बनवून, कौरवेश्वरानं प्याद्याचा फर्जी करण्यापूर्वीच, स्वभावजन्य क्षात्रतेजाच्या जोरावर, दुर्योधनाच्या विश्वासाचा किल्ला, या सूतपुत्र कर्णानं आधीचं काबीज केला होता, ही गोष्ट नजरेआड करूं नकोस. सूतकुलाच्या गारगोटीत जन्मलेल्या या हिऱ्याला उत्तेजनाचे पैलू पाडून, पारखी दुर्योधनानं आत्मतेजाचा उजाळा दिला. जन्मप्राप्त श्रेष्ठपणाच्या भाण्डवलावर जगणान्या ब्राह्मण क्षत्रियांनी, असल्या हिऱ्याच्या तेजापुढे आपल्या आत्मस्तोमाची निशाणं आता बिनशर्त खालीं वाकवली पाहिजेत.
अश्व० : सूर्याच्या प्रकाशावर चमकणाऱ्या परप्रकाशी चंद्रानं आत्मतेजाच्या वल्गना करूं नये. अशा वल्गनांना बाचकण्याइतकं ब्राह्मणांचं ब्रह्मतेज आजच काही हिणकस झालेलं नाही.
शल्य : आणि क्षत्रियांचं क्षात्रतेज सुद्धा निस्सत्त्व झालेलं नाही.
दुर्यो० : कोणाचंच तेज हिणकस नाही आणि कोणी कोणाच्या तेजाला हिणकस ठरवण्यांत शहाणपणा नाही. स्वयंभू पराक्रम आणि लौकिकी समजुती यांचा झगडा मानवी इतिहासाइतकाच जुनाट दिसतो. कर्णासारखे वीरच काय ते या झगड्याला दाबांत ठेवून, धोरणी आत्मविश्वासानं स्वकुलाचा न् स्वराष्ट्राचा उद्धार करतात. उच्चनीचत्वाच्या लौकिकी कल्पना स्वयंभू पराक्रमाच्या विकासाला दडपून टाकतात. केवळ लोकोत्तर मनस्सामर्थ्याचे धीरवीरच त्या दडपणाला प्रतिकाराची टक्कर मारून, लौकिकी कल्पनांचा खोडसाळपणा सिद्ध करतात. असं करताना समर्थाशीं अहंता करण्याचा प्रसंग त्यांच्यावर पुष्कळदा येतो, नाही असं नाही. पण आत्मविश्वासाच्या जोरावर जगात ते आणखी कशाचीच पर्वा ठेवीत नाहीत.
कर्ण : मानीव नीच कुळांत स्वपराक्रमी पुरूष जन्माला येऊन, या असल्या वरचढ लोकांच्या मगरुरपणाला, त्यांनी आपल्या स्वयंभू कर्तबगारीचे पायबन्ध वरचेवर ठोकले नसते, तर या घमेण्डानन्दनानीं मागासलेल्या सर्व समाजांना कृमिकीटकापेक्षांहि अत्यन्त नीच दशैला नेऊन चिरडले असते! अभ्यत्थाम्या, पोट भरण्यासाठी क्षत्रियाचा पेषा आणि जनतेवर वजन पाडण्यासाठीं ब्राह्मणाची दीक्षा, असली दुतोण्डी वृत्ति या कर्णाजवळ नाही. मी सूतपुत्र आहे आणि स्वयंभू क्षात्रतेजानं मी साऱ्या सूतकुलांचा उद्धारक आहे.
अभ्य० : खेचराला पुष्कळ शृंगारसाज चढविला म्हणून त्याला काही पंचकल्याणी अबलक घोड्याची पात्रता येत नसते.
शल्य : स्वयमेव मृगेन्द्रता कांहीं निराळीच असते!
कर्ण : तर-तर! तें काय विचारायचं! दोन सेनापतीनीं गेल्या पंधरा दिवसांत आपली स्वयमेव सृगेन्द्रता किती ठणठणीत वठवली, ती सर्वांनी पाहिलीच आहे. पहिले भीष्माचार्य! उघड उघड पाण्डवांचे पुरस्कर्ते. पण करतात काय बिचारे! अर्थस्य पुरुषो दासः न्यायानं, नाइलाज म्हणून, कौरवांच्या मिठाला कसेबसे जागले आणि अखेर वेदान्ती सबबीवर शरपंजरी पडले. दुसरे आमचे द्रोणाचार्य! त्यांचा थाट काय विचारता! शापादपि शरादपि! पण अखेर शापहि उपयोगी पडले नाहीत आणि शरहि कामाला आले नाहीत! वृत्ती ब्राह्मणाची न् कृति क्षत्रियाची! सांसारिक मोहाचा एक फटका येतांच, क्षात्रधर्म गडबडला आणि पोटासाठीं धनुर्धारी बनलेला ब्राह्मण अखेर दर्भदारी बनून हकनाहक कुत्र्याच्या मोतानं प्राणाला मुकला!
अश्व० : राजा, माझ्या स्वर्गस्थ पित्याची इतकी बेलगाम निंदा मला आतां मुळींच सहन होणार नाही. या तुझ्या पाळीव लाडक्या कुत्र्याच्या तोण्डाला तोण्डबेडी घाल, नाही तर--
कर्ण : नाही तर काय?
अश्व० : नाहीतर लाथेच्या टोकरीनं टाळक्याची कवची उखडून हातांत देईन.
कर्ण : कर्णाच्या मस्तकावर लाथ?
अश्व० हो हो. कर्णाच्या मस्तकावर लाथ.
कर्ण : (तलवार उपसतो) ब्राह्मणाघमा, तंगडी छाटून टाकीन. जातीचा ब्राह्मण पडलास, म्हणूनच जिवन्त राहिलास, नाहीतर उभा खापलून ठार केला असता.
अश्व० : मूर्खा, केवळ जातीमुळे मी तुला अवध्य झालों काय? तर मग हें घे, ही पहा मी माझी जात टाकली [गळ्यांतले जानवे ताडकन् तोडतो.] जातीच्या सबबीवर प्राणदान मिळविण्याची मला मुळीच इच्छा नाही. चल, सामर्थ्य असेल तर शस्त्र घेऊन हो सामन्याला तयार. [तरवार उपसतो.]
कर्ण : जातिधर्माचा संन्यास करणाऱ्या सोंगाड्या क्षत्रिया, युद्धाच्या आवाहनाला पाठ दाखविणारा हा कर्ण नव्हे. चल, ही घे पहिली सलामी.
[दोघेही तलवारी सरसावून पवित्रे धरतात. दुर्योधन अश्वथाम्याला आणि शल्य कर्णाला आवरून घरतात.]
दुर्यो० : हात आटोपा. आचार्यपुत्रा-कर्णा, काय हा अविचार! दोघेहि आपापली शस्त्रे आवरा. कौरवेश्वराच्या शिबिरांत तरी असली दांडगाई तुम्हाला शोभत नाही.
अश्व० : राजा, या पापाधम गुरुनिन्दकाला पाठीशी घालून. तूं आपल्या ऐश्वर्याची नि कौरवसाम्राज्याची हानी करून घेत आहेस. सोड तूं मला. या सूताघमाचीं खाण्डोळी केल्याशिवाय भारतीय महायुद्धाची यशश्री तुझ्यावर खास भाळणार नाही.
कर्ण : भटी बुद्धीलाच असले तोडगे छान सुचतात. शल्या, यावेळी तरी मला आडवू नकोस, या नाटकी क्षत्रियाचा शस्त्रास्त्राचा दिमाख किती फोलकट आहे, याचं प्रत्यन्तर मी आत्ताच दाखवतों.
अश्य० : अश्वत्थामा नाटकी क्षत्रिय? राजा, सोड माझा हात. या नीचकुलीन सूताधमाला नाटकी क्षात्रतेजाचा तडाका मला दाखवलाच पाहिजे.
दुर्यो० : अश्वत्थामन् कर्णा, आपापली शस्त्रे आवरून धरा, अशी हा कौरवेश्वर तुम्हाला आज्ञा करीत आहे.
कर्ण : [तरवार म्यानांत घालून)] कौरवेश्वराची आज्ञा शिरसावन्दद्य [अश्वत्थाम्यास] राजाच्या इच्छेनेंच तुला जीवदान मिळाले!
अश्व० : असलें जीवदान मला साफ नको आहे. राजा, कर्णवध झाल्याशिवाय हा अश्वत्थामा या खड्गाला मुळीच आवरणार नाही. नीच कुलोत्पन्नांना कशाहि अवस्थेत मारलें तरी पाप नाही. सूतपुत्रा हो मरणाला तयार! [कर्णाच्या अंगावर धावून जातो.]
शल्य : [अश्वत्थाम्याला उद्देशून] आचार्यपुत्रा, काय ही दाण्डगाई? राजाज्ञेचा अपमान?
अश्व० : या सूतपुत्रानं माझ्या पित्याचा केलेला अपमान राजाला खपतो.
शल्य : म्हणून तू राजाज्ञेचा अपमान करणार? महापाप. राजाज्ञेला क:पदार्थ मानणाऱ्यावर तरी सेनानिपदाचा विश्वास राजानं कसा टाकावा?
अन्य० : विश्वास टाकून तर पहा. राजा—
अतिनीच पापकर्मा हीनकुलोत्पन्न सूतज साहाय ।
शशिवंश भूषणाला तुज गुणवंतास योग्य हा काय ॥
मला सेनानिपदाचा अधिकार दे म्हणजे—
मारीन अर्जुनातें मी राजा काळजी नको वाहूं ।
क्रोधें अकर्ण विजया पृथ्वी करितोधि बोल बापा हूं ॥
दुर्यो० : अश्वत्थामन् मलां कर्णार्जुनशून्य पृथ्वी पाहण्याची इच्छा नाही. मला निःपाण्डवी पृथ्वी करायची आहे. अर्थात आपल्या पक्षांतल्या प्रधान वीरांनी एकमेकांशीं विरोध करण्याचा हा समय नव्हे.
शल्य : असल्या विरोधानं राजमण्डळावर आणि सैन्यावर केवढा विपरीत परिणाम होईल, याचा नको का काही विचार करायला? शिवाय उद्याचा सूर्य माध्यान्हीला येतांच, दुःशासनाच्या रक्तानं माखलेल्या हातानी, द्रौपदीची मोकळी वेणी मी बांधीन, अशी भीमानं आज प्रतिज्ञा केली आहे.
अश्व० : हा आचार्यपुत्र जिवन्त असेपर्यंत, युवराजाच्या केसाला स्पर्श करायची त्या वृकोदराची छाती नाही.
कर्ण : राजा, सेनानिपदाचे अधिकार मला तू दे अथवा देऊ नकोस. उद्या मी अर्जुनाशी द्वैरथ युद्ध करून, त्याला ठार मारीन किंवा मी मरेन, हीच माझी प्रतिज्ञा.
अश्व० : राजा, सेनानिपदाच्या अधिकाराशिवाय कर्ण जर अर्जुनवधाची प्रतिज्ञा करीत आहे. तर मला तूं आपला सेनापति कर. उद्यां सूर्यास्तापूर्वी नि:पाण्डवी पृथ्वी करून, पितृवधाचा मी कसा कचकचीत सूड उगवतो, तो पाहून घे.
दुर्यो० : गुरुबन्धो व्यक्तीपेक्षा कार्याचं महत्त्व मला अधिक आहे. भीष्माचार्य शरतल्पी पडल्यावर, कर्णाच्या आग्रहावरूनच द्रोणाचार्यांना मी सेनापतिपद दिलें. आतां कर्णालाच मी सेनापति करण्याचं ठरवलं आहे आणि धारातीर्थांत पतन पावलेल्या त्या प्रधान वीरांनींसुद्धा कर्णाच्या पराक्रमाची आधीच प्रशंसा केलेली आहे.
शल्य : कौरवेश्वराच्या योजनेला राजमण्डळाच्या वतीनं प्रणिपातपूर्वक मी अनुमति देतों.
दुर्यो० : कोण आहे तिकडे? आण से साहित्य [बेहडा आणती] अंगराज, कौरव सैन्याचं अधिपत्य या किरिटाच्या चिन्हान आपल्या पराक्रमी मस्तकावर मी स्थापन करीत आहे. [कर्णाला किरीट, खड्ग व पुष्पहार अर्पितो.]
कर्ण : कौरवेश्वरा, भी माझं कर्तव्य चोख बजावीन.
दुर्यो० : यात मला तिळमात्र शंका वाटत नाही.
अश्व० : राजा, माझ्यासारख्या उच्चकुलीन वीराला डावलून, या सूतपुत्राला तू सेनापती केलास? मर्जी तुझी सत्तेपुढं शहाणपण चालत नसलं, तरी माझ्या पित्याच्या नि माझ्या अपमानाबद्दल, आता माझी हीच प्रतिज्ञा, हा सूताधम कर्ण शत्रूच्या हातून ठार मारला जाईपर्यंत, हा आचार्यपुत्र अश्वत्थामा शस्त्रसंन्यास करीत आहे. [शस्त्र फेकून देतो.]
कर्ण: वडलांचच बाळबोध वळण गिरवलंस. यात विशेष काय केलंस?
अश्व० : विशेष काय?
कर्ण : तुझ्यासारख्यानं शस्त्र हातांत ठेवलं काय न् टाकलं काय. दोहींची किंमत एकच?
अश्व० : आणखी आगीत तेल ओतू नकोस, पाण्डवांच्या हातून जेव्हा हा नराधम मारला जाईल तेव्हा राजा, तुला या अश्वत्थाम्याचीच आठवण होईल. [जातो.]
दुयोंo : त्यावेळी मी तुला सेनापति करीन.
प्रवेश २ रा
[ हातांत फुलांची परडी घेऊन एका बाजूनें आवळकटी झपझप पावलें टाकीत येते. तोंच समोरुन हिरडा ताना मारीत प्र.क. ]
हिरडा : तुजविण मी हैराऽऽण!- याचं नांव प्रेमाचा झटका. झटक्यासरशी भेट आणि भेटीसरा झटका. माझ्या जिवाला तुझाच चटका!
आवळकटी : तुझी नाही का अझून भरली घटका? हिरड्या, सगळीकडे लढाईची
धामधूम आपल्या राजासाठी लढाईवर जाण्याऐवजीं माझ्यामागं कशाला भटकतोस?
हिरडा : मी ताना मारणारा गवई, माना मारणारा मारेकरी थोडाच आहे.
आवळ०: तुला राजकारणाची तरी काही चाड?
हिरडा : राजकारण? या लढाईत कसलं आलं आहे राजकारण? हव्या त्या गावगुण्डाला आपली गुण्डगिरी झाकायला, राजकारणाची गोधडी आजकाल छान सांपडली आहे! आवळकटी, या कौरव-पाण्डव-युद्धात राजकारणापेक्षा, स्त्रियश्चरित्र पुरुषस्य भाग्यम् चा मामला मुळाशीं आहे. हें तुला समजावून सांगितलं तरी उमजणार नाही.
आवळ० का उमजणार नाही?
हिरडा कारण तूं बाई आहेस, बुवा नाहीस.
आवळ० : बायांच्यापेक्षां बुवांना अक्कल जास्त असते की काय?
हिरडा: हें तर ब्रह्मदेव बोलला.
आवळ० : तो तरी मेला बुवाच! बायका जर बेअक्कल, तर अकलेबुवा बायांच्या मागं कशाला लाळ घोटीत फिरतात?
हिरडा : तेंच कोडं सोडविण्यासाठीं ही लढाई आहे. एकापेक्षां एक वरचढ, असे पांच नवरे करूनसुद्धां, कर्ण महाराजावर डोळा मारणारी महापतिव्रता द्रौपती, आतां जर कर्णाला कवटाळण्याचा जाहीरनामा काढील. तर एका क्षणांत ही लढाईची धामधूम थण्डगार पडेल.
आवळ० : द्रौपदीमुळे ही लढाई चालू झाली म्हणतोस?
हिरडा : ओदतन देन तान्. तुंदिर धिक्ता तेरे दान् । पांच नवऱ्यांचा उघडा बाजार थाटणाऱ्या द्रौपदीसाठी आज किती तरी वीर महावीर जिभल्या चाटीत आहेत. निःपाण्डवी पृथ्वीच्या अश्वत्थाम्याच्या वल्गना द्रौपदीसाठीं आणि कर्ण महाराजांची अर्जुनवधाची प्रतिज्ञा तिच्याच प्राप्तीसाठी. अर्जुन मेला कीं पांच नवऱ्यांच्या सरावाची ती रसाळ पतिव्रता अर्जुनाच्या रिकाम्या जागेवर कर्णाचीच नेमणूक करणार. हवेला पोकळी खपत नाही, तर द्रौपदीला एका नवऱ्याची कशी खपणार? द्रौपदीच्या डोळेमारणीत कर्णाचा कान अडकला की लढाई खलास, दुर्योधन महाराजांच्या साऱ्या उड्या कर्णाच्या जिवावर. तोच जीव द्रौपदीने घेतला की कौरवपक्ष आटोपला. हे सगळं लुगडयाचं राजकारण आहे. लुबऱ्याशिवाय यांत कोण भाग घेणार? आवळकटी, मला तूं हवीस, लढाई नको, द्रौपदी नको, काही नको. -तूं माझी पूर्वी, मी तुझा यमन. तूं माझी रामकळी, मी तुझा हिण्डोल तू माझी भैरवी, मी तुझा भैरव. [बेहडा प्र. के.]
बेहडा : अहो भैरव, वेताळ, म्हसोबा, खैसोबा बस करा आपलं एरंडाचे गु-हाळ.
आवळ० : [स्व.] गजकर्ण नायट्याची ही जोडी छान जमली.
हिरडा : हा दुष्टा भरतकुलाधमा, आवळकटीशी मी एकान्त करीत असतां, मध्येच येऊन आकान्त करण्याची तुला लाज कशी रे वाटली नाही.
बेहडा : आवळकटीशी लघळपणा करणाराचा एकाच मुरदंगी थापेत घात्रक धिन्ना कडान् धा केल्याशिवाय हा बेहडा रहाणार नाही. आवळकटीवर माझं प्रेम आहे.
आवळ० प्रेम असेल! पण तूं काही माझा नवरा नव्हस!
बेहडा : मी तुझ्यासाठीं जीव देईन.
हिरडा : तुझ्यासाठी मी या बेहड्याचा जीव घेईन.
बेहडा : अरे जा सोनामुखीच्या. ताकिट धाकिट तक तकधिग धुनुनुनु नकधिग धुनुनुनु, चिलांग घुमकिट, किटतक गदिगन धा. आस्ताईच्या एकाच थपडीत तुझा अंत्रा उखडून टाकीन.
हिरडा अरे जा गुलाबकळीच्या. नादिर्दिदिर तुदिर्दिदिर तुदिर्दिदिर तननन तननन तदारें तुद्रे दानी, तू मला मारणार? कुरूक्षेत्रावर जमलेल्या एकाहि रथीमहारथीची माझ्या तम्बोऱ्याला हात लावण्याची छाती झाली नाही. तो तूं चामडकुट्या मृदंग्या मला मारणार? `` कोण येतो तो पाहातो मजसी माराया-याया-अधि त्याचा प्राण घेतो कोप शमवाया. `` महायुद्धाची जयश्री पाण्डवांवर भाळते का कौरवांवर फिदा होते. याचा निकाल लागेल तेव्हां लागो, आवळकटी, भीमपलासाची शपथ घेऊन मी आज हमिरी प्रतिज्ञा करीत आहें कीं तुझ्या गांधारी पाणिग्रहणासाठीं हा हिरडा या बेहड्याच्या झुंबऱ्याचा दादरा केल्याविना राहाणार नाहीं.
[दोघे अस्तन्या सारून एकमेकांवर धांवतात.]
आवळ० : चला व्हा दूर मेल्यानो, द्रौपदीमुळं कौरव-पाण्डव युद्धाच्या वर्दळीवर आले. आवळकटीमुळं हिरड्या बेहड्याचं पीठ पडून त्यांचं त्रिफळाचूर्ण झालं, हा बदलौकिक मला साफ नको.
हिरडा : बदकर्मान बदलौकिक होतो. या हिरड्याच्या प्रेमाचं पीठ करून त्याची तीट तूं कपाळी लावशील तर बदाचा प्रश्न तेव्हांच बाद होईल.
बेहडा : आवळकटी, काय तूं या निरेधसा घसाड्याचं ऐकतेस! गवयी लोक मुळचेच बदफैली. या हिरड्यानं शेकडो वेळा रंगाचा बदरंग केलेला मी पाहिला आहे मृदंग्यापुढं गवयाची मिजास? दुग्गण चौगणीत देईन कुठच्या कुठं भिरकावून. -आवळकटी, तूं मलाच आपलं प्रेमदान कर.
हिरडा : अग, मृदंगी म्हणजे थापाडे. तूं काय लागतेस या थापाड्याच्या नादी. मृदंगाच्या वाद्या आवळून आवळून याच्या साऱ्या नाड्या आखडल्या आहेत.
बेहडा : रात्रंदिवस घसा फोडफोडून याच्या आळ्याचा घाम मळयाला गेला आहे.
हिरडा : म्हणूनच माझ्या प्रेमाचा मळा फुरफुरला आहे. आवळकटी, तू याच्याशी लग्न लावशील तर एका वर्षात मेल्या नवऱ्याची जिवन्त विधवा होशील.
बेहडा : आणि तूं या सुरावट्याची बायको होशील तर तारवट नवऱ्याचं लोढणं गळ्यात अडकवून कुमारीच्या कुमारीच राहशील. खरं सांग, तुझं कुणावर प्रेम आहे?
हिरडा : तुझ्या कौमार्याची तुला शपथ, माझ्यावर तुझ प्रेम आहे ना? माझ्या नावानं तूं कुंकू लावशील ना?
आवळ० : बोलून चालून मी दासी, त्यातून कुमारी, भेटेल तो तरूण मला आवडतो. सगळ्यांच्याच नांवानी कुंकवाचे टिकले लावीत सुटले, तर मळवटाखालीच माझं कपाळ बेपत्ता व्हायचं!
हिरडा : मळवटासारखी दुसरी राजरोस पळवाट नाही. लाब रूंद मळवटाच्या फरफाट्यामागं गोन्दले नोन्दलेले, लागले लावलेले, सगळे काळे डाग बेमालूम छपले जातात.
आवळ० : मळवटाचा पट्टा ओढून, त्रेकम् टिकली बनण्यापेक्षा, एकच छान बारीकशी टिकली लाऊन-
बेहडा : दोघांची बायको होत असशील तर हिरड्याशी एकतालाची सम दाखवून. तुला अर्धी अर्धी वाटून घ्यायला मी तयार आहे, कायरे हिरड्या, सूचनेला सम देतोस, का कालात लय करतोस?
आवळ० : म्हणजे? मेल्यानो, टरबुजासारखी मला उभी चिरणार की काय?
हिरडा : उभी चिरून कुणाला काय मिळणार? अग, पांच पाण्डवानी नाही का एक द्रौपदी वाटून घेतली?
बेहडा : त्यानी काय तिच्या चिरफळ्या केल्या थोड्याच?
आवळ०: तुम्हा दोघांची एकदम बायको होऊन द्रौपदीसारखं पांच नवऱ्याचं उघडं दुकान नाही मला थाटायचं.
हिरडा : द्रौपदीसारखं उघडं दुकान थाटायचं नसेल, तर कुन्तीसारखा झाकल्या प्रेमाचा व्यापार कर.
आवळ० तो कसा काय?
हिरडा पण्डु राजाच्या, नांवानं कुंकू लावून, तिनं नाही का तीन निरनिराळया देवांकडून-
बेहडा : किंवा देवमाणसांकडून-
हिरडा तीन पोरांची कमाई केली आणि आपल्या सवतीला-माद्रीला सुद्धा-दोन जुळ्या पोरांसाठीं या भारतीय पातिव्रत्याचा ओनामा शिकवला?
बेहडा : गुपचुप प्रेमाची गोडी काही और असते बुवा.
हिरडा : पण सासूपेक्षा सून निघडया छातीची.
आवळ० : एका बाईला एकच नवरा असं शास्त्र असता, द्रोपदीचा नि कुन्तीचा हा उघड गुप्त नवऱ्यांचा बाजार लोकांना कसा मान्य झाला?
हिरडा : मोठ्यानी शेण खाल्लं तर ते औषधासाठी आणि गरिबानं चुकून चाटलं-
बेहडा : अगदी श्रावणीच्या गोमूत्राबरोबर--
हिरडा : तर तें पोटासाठी, अशी या जगाची फार विचित्र तन्हा आहे.
आवळ०: अब्रूबेअब्रूची सारी भुताटकी गोरगरीबांच्याच मागं म्हणायची.
बेहडा : धागिन्ना धातुन्ना तागिन्ना तातुन्ना! कधिकाळीं बेण्ड बाहेर फुटण्याची वेळ आलीच, तर मंत्रतंत्राचा दाखला पुढं केला की लोकांची तोण्ड तोण्ड बन्द. तेवढ्यानं भागलं नाही तर अखेरचं अस्त्र म्हणजे आकाशवाणी! आकाशवाणीवर फेरतपासणीची सवलत नाही.
आवळ० : हिरड्या, तुझी लग्नाची बायको सोनामुखी घरात असता, तूं माझ्या प्रेमाच्या नादी कशालारे लागतोस?
हिरडा : अग, ती घरातली बायको आहे. दारातली नाही. म्हणून तर तुझ्या प्रेमासाठीं मी माझ्या जीवाचा आरोहावरोह ताणीत आहे.
बेहडा : बाहेरख्यालीचा नाद न् घरात बायकोची ब्याद!
हिरडा : तुला कोणी सांगितला हा नसता वाद?
आवळ०: माझ्याच प्रश्नाचा आहे हा पडसाद.
बेहडा : त्याची याला कुठं आहे दाद, चोर तर चोर आणि वर शिरजोर. गवयांचा धन्दाच सारा चोराचोरीचा! याची तान चोर, त्याची मेण्ड चोर, याची फिरक् चोर, त्याची भिरकु चोर! सारा जुनापुराणा चोरबाजार!
हिरडा : अरे हो चामडंकुटीच्या! घरात तुझी बायको गुलाबकळी असताना, आवळकटीच्या मागं तू रे कशाला गोण्डा घोळतोस थापबाजीच्या?
आवळ०: म्हणजे? बेहड्याला पण लग्नाची बायको आहे?
बेहडा : अग, ती लग्नाची बायको आहे.
आवळ०: मग तुला आता विघ्नाची बायको पाहिजे वाटतं?
बेहडा :लग्नाची बायको म्हणजे बासनातली पैठणी! षटीसामासी लोकांना दाखविण्यासाठी बाहेर काढायची आंगवस्त्राची गोष्ट तशी नाही. सदा नि कदा खान्यावर दुमडले मुरडले तरी पंचायतीचा प्रश्न नाही. धुणावळीत परटाने दोन दिवस डोळ्याआड आड केलं, तरी परत आल्यावर चोख ईस्तरीची परीट घडी!
हिरडा : हा म्हसोबा असा, पण ती बिचारी गुलाबकळी महासाध्वी.
बेहडा : आणि तुझी सोनामुखी काय गावभवानी आहे?
हिरडा : ए झपतालीच्या, माझ्या बायकोचं नांव घेशील तर तानेच्या एका फिरकीत तुझ्या मुरदंगाची ढोलकी करीन.
बेहडा : अरे जा सोहनीच्या! धमाराच्या एकाच आवर्तनांत तुझ्या कानड्याचे कान उपटून नरड्यात कोंबीन.
आवळ० : हां. असे कौरव पाण्डवांसारखे वेताळी वर्दळीवर येऊ नका. प्रश्न माझ्या लग्नाचा आहे. एकाच पुरुषाला दोन बायकांवर प्रेम करता येईल कसे?
हिरडा : न यायला काय झालं?
आवळ० : एका म्यानांत दोन तलवारी?
हिरडा : प्रश्न तलवारीचा नाही, म्यानांचा आहे. दोन म्यानांत एक तलवार आळीपाळीने बिनबोभाट राहील. प्रेम आधळं असतं.
बेहडा : आंधळ्या प्रेमाची शर्यत आन्धळाच छान जिंकतो. उगाच नाही मृदंग्यांच्या संप्रदायात आंधळ्या सूरदासांची एवढी गोचीड गर्दी!
आवळ० : आंधळ्या प्रेमाच्या शिकारीसाठी तुमही दोघेही आंधळे बनला आहात, हे कोणीहि धडसा माणूस डोळे मिटून सांगेल. तुम्हा दोघांच्या बायका जिवन्त आहेत; तेव्हा डोळे मिटून कुणाचंहि पाणिग्रहण मला करता यायचं नाही.
बेहडा : पाणिग्रहणाशिवाय प्रेमाची मण्डई थाटता येत नाही, असं थोडंच आहे?
हिरडा : लग्नाची फळी नवराबायकोच्या दुफळीनं तेव्हाच खिळखिळी होते म्हणून भवसागर तरून जायला बाजारचा भोपळा संग्रही ठेवावा लागतो.
आवळ० : बाजारी भोपळा? खेटर आडलाय माझा दोघांपैकी एकाशी लग्न लावणार आणि दुसऱ्यावर प्रेम करणार? पत्करतंय्? बोला.
बेहडा : ही तर द्रौपदीवर ताण झाली हिरडा जर पत्करीत असेल तुझ्या लग्नाचा मान, तर मी पत्करतो तुझ्या प्रेमाचं दान.
हिरडा : लग्न? पटकी पत्करली! एकाच लग्नाची मी इतकी हैबत घेतली आहे. की मेलो तरी लग्नाच्या फन्दात मी पुन्हा पडणार नाही. पुनर्विवाहाच्या मी अगदी विरुद्ध आहे. आम्बराई जोपासण्याचा खटाटोप करण्यापेक्षा, आजुबाजूच्या झाडावरचे चार दोन आम्बे सहज जाता येता मटकावलेले फार बरे! लग्नाच्या सुक्या खोकल्यापेक्षा प्रेमाची ओली खरूज बरी! चिघळेल तशी पचरत जाईल!
बेहडा : आवळकटी, तुझ्या प्रेमासाठी हा बेहडा आपल्या जिवाचा धिरकिट तक धा. किडान् किडतक गदिगन धा करायला तयार आहे.
आवळ० : उगाच आपल्या जिवाची पातळभाजी करू नका. दोघांवर मला येणार नाही, आणिं दोघांशी मला लग्नहि लावता येणार नाही.
हिरडा : आवळकटीशिवाय हिरड्याला जगता येणार नाही.
बेहडा : आणि बेहड्याला मरता येणार नाही.
आवळ० : कुणी मरू नका आणि जगूहि नका. माझं ऐका, हिरड्या, तू आहेस
तानदार गवयी--
हिरडा : [तान मारून ] ते काय सांगावं ऽ ऽ ऽ!
आवळ० आणि बेहड्या, तू आहेस--
बेहडा : पल्लेदार थापेचा कल्लेदार मृदंग्या-धीं धीं धागेत्रक तूना कत्ता धागेत्रक
धीना.
आवळ० अर्जुनधासाठी कर्णमहाराजांची स्वारी बाहेर पडण्यापूर्वी आपापल्या कलेनं जो कोणी माझं मनपसंत प्रेमाराधन करील, त्याला मिळेल प्रेमाचा मान उरेल त्याचा लग्नांत अडकवीन कान. का? आहे की नाही युगत छान?
हिरडा : ठीक ठीक, अशी घेतो संगीताची जीवतोडी तान, की आवळकटीचं मलाच हटकून प्रेमदान [जातो.]
बेहडा : मृदंगावर अशी कडाडवतो कडान् धा थाप की आवळकटीवर बेहड्याची
छातिठोक छाप. [जातो.]
आवळ० : दोघांची अश्शी घेते संगीत कानपिचकी, की झटकन उतरेल यांच्या प्रेमाची उचकी. [जाते.]
-----
प्रवेश ३ रा
[कर्णाचे शिबिर. विचारमग्न कर्ण शतपावली करीत आहे तोच बेहडा येऊन प्रणाम करतो.]
कर्ण: बेहड्या काय बातमी आहे?
बेहडा : बातमी नाही विनन्ती आहे सरकार. एवढं महायुद्ध चालू आहे. माझ्यासारख्या गरिबाच्या कर्तबगारीला थोडी संधि द्याल, तर जिवाचं सोनं होईल.
कर्ण : संधि कां नाही? या वेळी तर प्रत्येकाने आपल्या राजासाठी जिवावर तुळशीपत्र ठेवलं पाहिजे.
बेहडा : नुसता तुळशीपत्रावर जीव ठेवून काय फायदा सरकार? या बेहड्यानं तब्बल दोन तपं मृदंगाच चामडे कुटून या तळहाताचा कातळ केला आहे. मृदंग्याची थाप वैऱ्यावर पडू नये म्हणतात. इंद्राच्या वज्राचं पीठ पडायचं! आपल्यासारख्यानी नुसतं बोट दाखवताच, पराक्रमाचा असा धिरकीड तक धा किडाSन किडतक गदिगन घा करतो की ज्याच नाव ते सरकारनी अर्जुनवधाची कामगिरी माझ्यावर सोपवावी—
कर्ण: तुझ्यावर सोपवावी? मूर्खा, तू मृदंग्या. सारी हयात मृदंग बडवण्यात गेली. तू अर्जुन वध करणार?
बेहडा : हेच हेच! गरीबाच्या कर्तबगारीला वालीच नाही. परमेश्वरा, गंधर्व तुंबरा, अरसिकेषु मृदंगवादनम् शिरसि मा लिख मा लिख मा लिख!
कर्ण : बेहड्या, गरीब श्रीमन्तीच्या मापानं बुद्धीचं किंवा कर्तबगारीचं माप मापणारा हा कर्ण नव्हे. पण मृदंग्या अर्जुनवध करणार, ही त्या प्रश्नाची निवळ थट्टा आहे.
बेहडा : थट्टा! मर्जी आपली. मृदंग्या म्हणजे माणूस नव्हे, पुरुष नव्हे, का मर्द नव्हे? शिखण्डीसारखा धड ना नारी धड ना नरसुद्धा भीष्मासारखा महान् योद्धा पालथा घालतो, तर अर्जुनवध मला काय कठीण आहे?
कर्ण: तू अर्जुनबंध कसा करणार?
बेहडा : सेनापतीनी उद्या तहनाम्याची हुलकावणी दाखवून, पाण्डवांच्या समोर आमचा संगीत जलसा उभा करावा. हिरडा गाणार, आवळकटी अशी झम्पक थै थै झम्पक थै थै नाचणार आणि मी भम्पक कडघुम् भम्पक कडधुम मृदंग वाजवणार. नावाच्या रिंगणात फिरतां फिरतां, समेच्या अवसानात अर्जुनाला ऐSसी एक पोलादी चफराक लगावतो का एकाच कडान् धात् मामला खलास.
[आंत--" दानशूर कर्णा, मला भेट देतोस का जाऊ परत? किती वेळ मी ताटकळत उभा राहाणार"]
बेहडा : (दचकून) धीं धीं धागेत्रक तूना कत्ता झाला! सरकार, बाहेर एक भटजी आला आहे आणि तो सेनापतीची भेट घेऊ इच्छितो. हे सांगायला मी विसरलो.
कर्ण : मूर्खा, जा त्याला आत पाठवून दे. [बेहडा जाऊ लागतो] अरे थांब. त्यानं आपलं नांवगाव काही सांगितलं का?
बेहडा : सांगितलं तर! काय बरं ते नाव! मृदंगाच्या बोलानी डोक्यात गर्दी केल्यामुळे, या नावागावाच्या संस्कृत भानगडी इथं टिकतच नाहीत. --हो, आठवलं, --वासुदेव भटजी, आणि तो पाण्डवांच्या छावणीतून आला आहे.
कर्ण : पाण्डवांच्या छावणीतून?--दे त्याला आत पाठवून (बेहडा जातो.] (स्व.) पाण्डवांच्या छावणीचं नाव स्पष्ट सांगतो. तेव्हा माझी शंकाच अखेर खरी ठरणार.
[ वासुदेव भटजी प्र. क.]
वासुदेव : अगराजा, तुझं स्वस्तिक्षेम असो.
कर्ण : यावं भूदेव, तुमचं स्वागत असो. आमच्या शत्रूच्या छावणीतून, इतक्या अपरात्री इकडं येण्याची आपण कां कृपा केली?
वासु० : राजा, धर्माच्या नावाखाली अधर्म मातला, तर त्याला योग्य वेळी पायबन्ध ठोकण्यासाठीच ब्राम्हणांचा जन्म आहे.
कर्ण : तर मग, अश्वत्थाम्याच्या मृत्यूची कंडी उठवून, अधर्म करणाऱ्या धर्मराजाचं योग्य ते पारिपत्य करूनच भूदेवानी इकडं येणं केलं असेल?
वासु० : राजा, अधर्म हा केव्हाही अधर्म मग तो धर्मानं केलेला असो तो अगर कोणीहि केलेला असो. आचार्यपुत्र अश्वत्थाम्यानं सूतपुत्र सूतपुत्र म्हणून केलेला तुझा उपहास, त्याच्या वृत्तीला आणि बीदाला कितीहि साजला शोभला, तरी माझ्यासारख्या सत्यशोधक ब्राम्हणाला तो मुळींच रुचला नाही.
कर्ण : अश्वत्थामा निर्भेळ सत्यच बोलला. त्यानं माझ्या सूतकुलाचा केलेला निर्देश उपहासाची भाषा बाद केली तर, सत्याला धरूनच होता. त्यात तुम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. भटजीमहाराज, मी तुम्हाला पुन्हा बजाऊन सांगतो की हा कर्ण सूतपुत्र आहे, आणि त्याला आपल्या शूद्रातिशूद्र सूत कुलांचा अपरिमित अभिमान वाटत असतो. साऱ्या पृथ्वीच्या साम्राज्यदानानं सुद्धा या वाजवी अभिमानाचा अणुरेणुसुद्धा कर्णाच्या हृदयातून आमरण चळणार ढळणार नाही. ही खात्री ठेवा.
वासु० : केसरीचा छावा दुर्दैवानं मेंढराच्या कळपात वाढावा आणि त्यामुळे मेण्ढकुलाचाच त्याला अभिमान वाटावा, अशासारखी तुझी स्थिती झालेली आहे. हा सत्यशोधक ब्राम्हण या यज्ञोपविताची शपथ घेऊन तुला सांगत आहे, की तू अधिरथ- राधा-पुत्र सूत नसून, क्षात्रकुळभास्कर पण्डु-कुन्ति-पुत्र पहिला पाण्डव आहेस.
कर्ण : वासुदेव भटजी. तुमच्या या लोकोत्तर शोधाची तारीफ करण्याइतकी काव्यरसिकता या कर्णाला नाही, याचं मला फार वाईट वाटतं. कोणी मला पाण्डव ठरवलं. माझ्या क्षात्रबीजाचा बिनतोड दाखला दिला, किंवा मला परमेश्वराच्या सिंहासनावर नेऊन बसवलं, तरी या अधिरथ-राधा-पुत्र कर्णाचा सूतकुलिनत्त्वाचा अभिमान रेसभर सुद्धा कमी होणार नाही. वासुदेव भटजी, कुलांचे अभिमान विकत घ्यायचे नसतात. निसर्गप्रेमानं ते कमावले जातात.
वासु० : अंगराजाचा बोल फोल कोण ठरवणार? तुझ्या गुणकर्माच क्षात्रतेज आज साऱ्या दुनियेचे डोळे दिपवीत आहेच. तुझ्यासारख्या देवपुत्राला सूतकुलीन कोण म्हणेल? राधेनं तुला वाढविलं असलं तरी ती काही तुझी जन्माची माता नव्हे. हरिणीच्या पोटी कधी वाघाचा जन्म होणं शक्य आहे काय? हे तुला सप्रमाण पटवून देण्यासाठीच, इतक्या अपरात्री भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने—
कर्ण : भगवान् श्रीकृष्ण? या दगलबाजाला तुम्ही `भगवान` सुद्धा बनवलात का? धन्य आहे तुमच्या सुपीक डोक्याची! तुम्ही तोण्डपुजे लोक केव्हा कोणाला भगवान् महात्मा न् महाराज बनवाल, याचा काही नेम नाही. मी सूतपुत्र असलो काय किंवा राजपुत्र असलो काय, विहित कर्तव्य पार पाडण्याच्या कामी या दाखल्यांची मला काही जरूरी भासत नाही. जन्माच्या काकतालीय कळकट पुण्याईपेक्षा, दणकट मनगटाच्या पौरुषावरच या कर्णाला आपलं नांव इतिहासात चिरंजीव करून ठेवण्याची इच्छा आहे.
वासु० : अंगराजा, तुझ्या निस्पृह वाणीचा कण न् कण हिरेमाणकासारखा सत्याच्या तेजानं चमकत आहे. पण राजा, एकाच आईच्या उदरातून जन्मलेल्या भावांचा आणि त्यांच्या बरोबर लक्षावधि भारतीय क्षत्रियांचा निष्कारण नाश करण्याचं पाप जर तुझ्या माथी बसत असेल, तर ते टाळण्या इतका मनाचा उदारपणा दानशूर कर्णाजवळ आढळणार नाही का? राजा, गैरसमजुतीचा हट्ट आता सोडून दे. खरोखरच तू कुन्तीच्या पोटी जन्मलेला पहिला पाण्डव आहेस. म्हणूनच तुझ्या हातून अर्जुनाचा, तुझ्या सारख्या पाठच्या भावाचा, वध होता कामा नये. भ्रातृवधासारख्या महत्पापानं आजवरच्या दिगन्त किर्तीला काळीमा फासू नकोस. अशी भगवान् श्रीकृष्णानं तुला आज्ञा केली आहे.
कर्ण : तो नाटक्या चेटक्या या कर्णाला आज्ञा करणार? आमच्या शत्रूचा सारथी या कौरव सेनापतीला हुकूम फर्मावणार? असला अपमान कौरव क्षणभरसुद्धां सहन करणार नाहीत. दगलबाजांचा वेदान्त मला चांगला कळतो.
वासु० : कर्णा, तू विवेकाचा मूर्तिमंत अवतार असता, त्या भगवान् श्रीकृष्णाची निन्दा करतोस? आतापर्यंत मी तुझ्याशी सामोपचारानं बोललो. पण माझ्यापुढं त्या अवतारी महात्म्याची निन्दा करशील, तर माझा राग अनावर होईल.
कर्ण : सत्यशोधक ब्राम्हणालाही राग येतो म्हणायचा! भटजीबुवा, यादव कृष्ण तुमचा भगवान् असेल अवतारी महात्मा असेल, तर त्याला अर्जुनाच्या खटाऱ्यावरून उतरा आणि घरच्या देव्हाऱ्यांत थापून, त्याची त्रिकाळ पूजा करा. पण त्या तुमच्या आंधळ्या भक्तीची सक्ती या कर्णावर काय म्हणून? शिवाय, मी कुन्तीचा राजपुत्र आहे, का राधेचा सूतपुत्र आहे. का एखाद्या गावभवानीचा वेश्यापुत्र आहे. हे ठरविण्याची उठाठेव गवळ्याच्या त्या दगलबाज पोराला कोणी सांगितली? अर्जुनाला पाठीशी घालून, कर्णाच्या शस्त्रास्त्रापासून त्याचं रक्षण करण्याची यादवी अक्कल पालथी पडली असेल, तर कौरवेश्वराला बिनशर्थ शरण येऊन आपलं मरण वाचवा, उकरून काढलेल्या जुन्यापुराण्या नात्यागोत्याच्या सबबीवर कर्णाचा बुद्धिभेद करण्याची कारवायी फुकट आहे.
वासु० : उन्मत्त कर्णा, अरे जे निर्गुण निराकार परात्पर चैतन्य श्रीकृष्णाच्या रूपानं या भूतलावर अवतरलं आहे, त्याची निन्दा तुला शोभत नाही.
कर्ण : भटजीबुवा, या अवताराच्या कल्पना भोळ्याभाबड्या नामर्द निराशावाद्याना शिकवा. त्याना त्या लवकर पचतील.
वासु० : मदान्धा, तुझ्या गर्वाची परिसीमा झाली.
कर्ण : भटजीबुवा, वरच्यानी तेजोभंगाच्या लाथा मार मारून खाली दडपलेल्या सूतादि शूद्राना कसला आला आहे गर्व? आत्मविश्वासाच्या मळ्यातच गर्वाचा दवणा दरवळतो. मी आपल्या गर्वाची फेक गगनाला भिडे इतकी उंच भिरकावीन, तेव्हा माझ्या गरीब न कष्टाळू जातभाईना थोडासा धीर देऊन, ते आपल्या माणुकसीच्या हक्कासाठी धडपडू लागतील. आजपर्यंत गर्वाचा सारा खजिना तुम्ही वरिष्ठांनी वापरला. आता थोडासा तरी आपच्या हाती लागू द्या की! धनुर्धर कर्णानं गर्व करू नये, तर काय त्या आसूडधारी काळ्या कपट्यानं करावा?
वासु० : कृष्णाच्या पाठीमागं हवी तशी निन्दा करणारी तुझी जीभ, तो समोर येऊन उभा ठाकला, तर चटकन् कायमची टाळ्याला चिकटेल.
कर्ण : कुणाची जीभ टाळ्याला चिकटणार, ते उद्याच्या संग्रामात दिसून येईल. वासुदेवभटजी, कृष्णाचा दरारा तुमच्यासारख्या भेकड भक्ताना आणि ` भगवान्, भगवान् ` म्हणून त्याच्या आरत्या करणाऱ्या भराडी भोप्याना. या कर्णाला काळाची दरकार नाही तर त्या सोंगाड्या घोडेहाक्याची काय किंमत?
वासु० : कृष्णासमोर असली भाषा वापरण्याची तुला छातीच होणार नाही.
कर्ण : पण या कौरवसेनापतीपुढं येऊन उभं राहायला कृष्णाला तोण्डच नाही.
वासु० : अरे, तो अनन्त-ब्रह्माण्ड-नायक—
कर्ण : अनन्त गोपी नायक.
वासु० : माया सूत्र चालक--
कर्ण : चेटकी कपटी नाटकी.
वासु० : इच्छामात्रे करून हवा तिथं प्रगट होईल.
कर्ण : फक्त कर्णाच्या शिबिराखेरीज, सर्वत्र.
वासु० : कां? कर्णाच्या शिबिरांत सुद्धा—
[मोठा आवाज होतो, प्रकाश पडतो, भटाचा वेष टाकून श्रीकृष्ण प्रगट होतो.]
वासु० : हा पहा कर्णाच्या समोर कृष्ण.
कर्ण : आणि कृष्णासमोर हा पहा धनुर्धर कर्ण, माझीच शंका खरी ठरली. मला वाटलंच होतं की अर्जुनवधाची माझी प्रतीज्ञा ऐकतांच, माझी एकान्ती भेट घ्यायला तू धावत येशील. कृष्णा, नाटक तर छान रंगवलंस रे!
कृष्ण : कर्णा, अरे मी मूळचाच नाटकी. पण माझ्या नाटकांत अर्थ असतो, अनर्थ नसतो. निष्कारण अनर्थ टाळण्यासाठीच मला अनेक नाटक नटवावी लागतात.
कर्ण : आता कोणता अनर्थ टाळण्यासाठी है वासुदेवभटजीचं नाटक केलंस? अजुनचा जीव बचावण्यासाठीच ना मला पहिला पाण्डव बनवण्याची धडपड?
कृष्ण : अर्जुन माझा शिष्यच तेव्हा त्याच्यावर माझं प्रेम केव्हाही असणारच. पण तू पडलास माझा मित्र. तुझ्यासारखा धनुर्धर तूच. दानशूर, सत्यनिष्ठ आणि स्पष्टवक्ता या सद्गुणानी आधीच तू साऱ्या जगाच्या प्रेमाचं आणि आदराचं केंद्र होऊन राहिला आहेस. तेव्हा मला तुझ्याबद्दल साहजिकच विशेष प्रेमादर वाटतो. भीष्मद्रोणांची आम्ही कधीच पर्वा पाळगली नाही, कारण त्यांची भूमिका ``मोले घातले रडाया । नाही आसू आणि माया" अशी होती. पण तुझी भूमिका सत्याच्या कडकडीत निष्ठेची असल्यामुळं. तुझ्यासारख्या कर्तव्यदक्ष महारथीच्या हातून सत्याचा यत्किंचितहि लोप होऊ नये, ही माझी विवंचनाच मला इथं घेऊन आली आहे कर्णा.
कर्ण : अर्जुनवधाच्या प्रतिज्ञेनं सत्याचा लोप कसा काय होतो कृष्णा? धर्मयुद्धाच्या कडक शिस्तीनं पाण्डव माझ्याशी सामना देतील, तर अर्जुनाचीच गोष्ट कशाला. तुझ्यासकट सर्व पाण्डवाना उद्याच्या उद्या धारातीर्थी मोक्षाची वाट दाखवीन.
कृष्ण : ही आमची बालंबाल खात्री आहे कर्णा.
कर्ण : पण तू पडलास ना जातीचा दगलबाज मुत्सद्दी! तुझ्या पाताळ यंत्रापुढं मात्र माझ्यासारख्या सरळ न साध्या शिपायीगड्याची मात्रा चालणार नाही. पण त्याच वेळी हेहि लक्षांत ठेव की, कर्णाच्या शरवृष्टीनं नामोहरम होण्याची वेळ आल्यावर,शेवटचा ठराविक तोडगा म्हणून, पाण्डवानी कपटनीतीचा अवलंब केला, तरी आम्ही कौरव, विशेषतः हा राधापुत्र कर्ण, प्राणान्तीहि शठेप्रति शाठ्यम् ची कास धरणार नाही, ही मात्र खात्री असूं दे, अधर्मयुद्धानं मिळणारा जय पाण्डवानाच लखलाभ असो. आता तर नाही ना सत्यलोपाची तुला धास्ती?
कृष्ण : कर्णार्जुन-युद्ध हीच मुळी आधी सत्यची मोठी हानी होत आहे. कर्णा, खरोखरच तू कुन्तीपुत्र ज्येष्ठ पाण्डव आहेत, हे गुह्य वेळीच प्रगट करून, तुझ्यासारख्या नीतिमंताच्या हातून नेणतेपणानं होणारी भ्रातृहत्या वाचविण्याची मी धडपड करीत आहे. यात राजकारण नाही, मुत्सद्देगिरीचा डाव नाही, काही नाही. सरळ मनाची सरळ विवंचना आहे. तू कुन्तीचा कानीन पुत्र आहेस. विवाहापूर्वी कुमारीदशेतच प्रत्यक्ष सुर्यापासून तिला तुझा गर्भसम्भव झाला—
कर्ण : आकाशातल्या चन्द्र सूर्यादि ग्रहांकडून पृथ्वीवर मानवी प्रजोत्पादन होऊ शकते. ही कल्पना कवीच्या काव्यातच छान शोभून दिसेल.
कृष्ण : पुढं तुझा जन्म होताच, सूर्याच्या सांगण्यावरून तिनं तुझा गंगेच्या जलांत त्याग केला.
कर्ण : सूर्याच्या सांगण्यावरून, का लोकमताला भिऊन?
कृष्ण : त्याग केला. ही गोष्ट खरी.
कर्ण : झालं तर मग. मी उपजताच कुन्तीनं माझा असा निर्दय त्याग केल्यानं मी तिला मेलो न् ती मला मेली. मी परक्याचा झालो. हे टाकलेलं पोर परक्यांचं झालं. कुन्तीला मातृप्रेमाचा आणि तुम्हा यादव पाण्डवाना बंधु-प्रेमाचा आत्ताच एवढा उमाळा येण्याचं काय रे कारण? कृष्णा, मला असल्या नाटकी प्रेमाची फार चीड आहे. उघड्या माथ्याच्या शत्रूपेक्षां तुमच्या सारखे असले नाटकी आप्तमित्रच फार घातकी.
कृष्ण : पण कर्णा, सुन्दर फुललेला गुलाब तेरड्याच्या ताटव्यांत डुलताना रसिकांना पाहवत नाही. कौरवांचा सेनापती होऊन, एकाच आईच्या उदरातून आलेल्या भावडांची कत्तल करण्याचं महत्पातक जोडण्यापेक्षा, आत्ता तू माझ्या बरोबर चल. पहिला पाण्डव म्हणून आम्ही सर्व तुलाच आमचा चक्रवर्ति करतो. धर्मादि पाच पाण्डव आणि त्यांच्या बाजूचे सर्व राजे महाराजे तुझे पाय धरतील ; आणि एक नाजूकच गोष्ट सांगायची, तर तू सहावा ज्येष्ठ पाण्डव, म्हणून द्रौपदीसारखी त्रिभुवन सुन्दरी हिशोबाप्रमाणं वर्षातून दोन महिने तुझ्या वाट्याला येईल.
कर्ण : कृष्णा, ही बायकांची मोहिनी तुलाच छान शोभते. असल्या मोहाला भाळणारा हा कर्ण नव्हे. जन्माच्या अपघातामुळे कुन्ति माझी जननी, आणि म्हणून मी पाण्डव, हे कितीहि खरं असलं, तरी त्या जन्माच्या आईपेक्षा, माझ्या कर्माच आई राधा माउली, हीच माझ्या जीवनाचं निधान होऊन राहिली आहे, त्याची वाट काय? मुलाला केवळ प्रसवली, एवढ्याच सबबीवर कोणत्याहि स्त्रीला मातेचे अधिकार प्राप्त होत नसतात. त्यासाठी मातेचं कर्तव्य चोख बजावावं लागतं. कुन्तीनं ते बजावलं का? उलट या मांसाच्या गोळ्याचा तात्काळ नाश करण्याच्या हेतून, केरकचऱ्या प्रमाणं, किंवा अधिकच स्पष्ट बोलायचं तर, विष्टेच्या गोळ्या प्रमाणं, बिनदिक्कत तो नदीत फेकून दिला. माझं नशीब आणि सूतकुलाचं भाग्य. म्हणून तो मांसाचा गोळा नदीतून वाहात जात असता, अधिरथाच्या नजरेला पडला. भूतदयेनं उचलून त्या साधु पुरुषांनं तो घरी आणला, आणि आपल्या साध्वी पत्नीच्या-राधेच्या-ओटीत घातला. राधा अप्रसूता होती. तरी मातृत्वात्सल्याच्या प्रेगोद्रेकानं-कृष्ण-त्या सच्छील मावलीला चटदिशी पान्हा फुटला आणि तिनं तटदिशी त्याला उराशी लावलं. मातृहृदयाचं ते अमृतपान, आऽहाऽ कृष्णा, मरेपर्यंत माझ्या डोळ्यात अश्रूच्या हिरकण्या या अशा चमकावीत राहील! अरे, कुठे माझ्या राधा मावलीचं तं निर्व्याज प्रेम, आणि कुठे त्या पाषाणहृदयी कुन्तीनं केलेलं पोटच्या गोळ्याचं बलिदान! कृष्णा, राधामातेनं आणि अधिरथ पित्यांनं कसलीहि खन्ति न बाळगता माझं मलमूत्र रे काढलं. बालपणाचे अनेक हट्ट नि लाड पुरवले, जातकर्म-संस्कारानी दगडाचा देव केला आणि या पदवीला आणून ठेवला. त्यांच्या निर्व्याज प्रेमाशी मी दगलबाजी करूं? घातक कुन्तीचा पाण्डव बनून, या माझ्या साधू मातापित्याचा पिण्डलोप करू? नाही नाही, कर्णाच्या हातून हे दुष्कर्म घडणार नाही, आता कोणी मला कसलीहि जबरदस्ती भीति घातली, शाप दिले किंवा पृथ्वीदानाची लालूच दाखविली, तरी या प्रेमबन्धनाला एक जन्म तरी मला खोटं पाडता येणं शक्य नाही.
कृष्ण : आहाहा कर्णा, तुझ्या उदार दिल्दार स्वभावावरून जीव ओवाळून टाकावा असं वाटतं, महायुद्धाच्या श्रीगणेशालाच गर्भगळीत न् हतबुद्ध झालेल्या अर्जुनाला गीतोपदेशाचा हेमगर्भ देऊन, मला संगरप्रवण करावा लागला. पण तू तर स्वयंभू ज्ञानी. शस्त्रास्त्रसम्पन्न धनुर्धर. विवेक तुझ्यापासूनच शिकावा अति तेजाळ सत्यनिष्ठेचे घड़े तुझ्याच कित्त्यावरून गिरवावे. कुन्तीच्या बालबुद्धीने तुझा त्याग न होता, पहिला पाण्डव म्हणून तू पाण्डवांतच वाढला असतास, तर कौरव पाण्डवांच्या इतिहासाला काही निराळंच वळण लागून या भारतखंण्डाच्या भाग्यानं हिमालयाला ठेंगणं केलं असतं. पण घडली चूक सुधारता येत नाही, असं थोडंच आहे? आईची चूक पुत्रानं सुधारण्यातच, कर्णा, तुझ्या कीर्तिदुदुंभी त्रैलोक्यांत दुमदुमणार आहे.
कर्ण : कृष्णा, तुझ्यासारखा त्रिकाळज्ञाता पुरुषोत्तम आज दुसरा कोण आहे? चुकीची दुरुस्ती व्हायला काळाचाहि काही विवेक पाहिला पाहिजे का नको?
कृष्ण : माझ्यावर तुझा विश्वास आहे ना?
कर्ण : फक्त स्वतःच्या विवेकबुद्धीवरच कर्ण नेहमी विश्वास ठेवतो.
कृष्ण : काही हरकत नाही. तुझ्या विवेकालाच विचार, तो खात्रीनं असं उत्तर देईल, की चुकीची दुरूस्ती करण्याची हीच वेळ आहे, हीच वेळ आहे, हीच वेळ आहे. तू पाण्डव आहेस म्हणूनच पाण्डवाना धन्य करण्यासाठी माझा हात धरून, जननी कुन्तीच्या दर्शनाला तू आलं पाहिजेस. हाच तुझा धर्म आणि हीच तुझी सत्यनिष्ठा.
कर्ण : पुरुषोत्तमा, काय म्हणतोस है?
कृष्ण : वाजवी तेच म्हणतो. मित्रा कर्णा, कौटुंबिक समाजकारणाइतकं कौरवनिष्ठेच्या राजकारणाला महत्त्व देण्यात अर्थ नाही.
कर्ण : कृष्णा, हा तुझा बुद्धिवाद कुणी ऐकला, तर गीतेसारखं सनातन उपनिषत्सार जगाला देणारा श्रीकृष्ण तो तुच काय, अशी शंका घेतील रे. कर्तव्य कोणतं न् अकर्तव्य कोणतं याची विविकशुद्ध प्रचिती अर्जुनाला पटवून देणारा श्रीकृष्ण या कर्णासमोर येताच, अर्जुनासारखाच हतबुद्ध व्हावा? सारसार विचारांत सुद्धा त्याचा विवेक बुळाबावळा बनावा? मोठे आश्चर्य आहे! कृष्णा तुझ्यासारख्या योगेश्वराला उपदेश करण्याची या कर्णाची पात्रता नाही. पण केवळ पाण्डव-पक्षपाताच्या आणि कौरव-घाताच्या लौकिकी मोहानं, तू माझा बुद्धीभेद करू पाहात असशील तर इतकंच तुला स्पष्ट सांगतो, की कर्णाला कर्तव्यच्युत करण्याचा अच्युताचा प्रयत्न फुकट आहे. कृष्णा, समाजकारण आणि राजकारण या एकाच मोहरेच्या दोन बाजू आहेत. त्यांना निराळं लेखताच यायचं नाही. मातृपितृद्रोहाची शिकवण फसल्यावर, आता तू मला राजद्रोहाचा मोह घालू पहातोस काय?
कृष्ण : तुझ्या एकट्याच्या राजद्रोहानं कोठ्यावधि भारतीय क्षत्रियांचा संहार थांबत असेल—
कर्ण : तरीहि मी राजद्रोह करणार नाही. कृष्णा, कौरवेश्वर दुर्योधनानं या कर्णाला आश्रय दिला नसता, तर तुम्ही यादव पाण्डवानी मला न् माझ्या सूतकुलाला पशुवृत्ती-पेक्षा फारसं वर डोकंच काढू दिलं नसतं. दुर्योधनाच्या पक्षाला मी निष्ठेन चिकटून राहिलो, म्हणूनच पाण्डव-निःपाताच्या संगर यज्ञाला त्यानं हिमतीनं हात घातला. कौरव पक्षाकडून सव्यसाची अर्जुनाशी द्वैरथ युद्धात भिडण्यासाठी प्रथमपासूनच त्यानं माझी योजना करून ठेवली आहे. युद्धाच्या ऐन भरात कौरव-विश्वासाचा सेनानी-किरीट माझ्या मस्तकावर चढला असता, अचानक पाण्डवाना सामील होऊन, कौरवेश्वराच्या राजद्रोहाची मसलत स्वीकारण्याइतकं या कर्णाचं बीज न् ब्रीद खास हिणकस नाही.
कृष्ण : माझी जिव्हाळ्याची मसलत तू झुगारून देत आहेस, तेव्हा भावी विनाशकाळ कुणाला टाळता येत नाही, हेच खरं!
कर्ण : कृष्णा, तुला हे सगळं समजत आहे. तर मला भूल घालणयाची एवढी खटपट कशाला केलीस? भारतीय क्षत्रियसंहाराला आम्ही कौरव कारण आहोत, हा आक्षेप एकतर्फी पक्षपाताचा आहे. न्यायान्यायाची चिकित्सा भविष्यकाळ करील. त्याचा वाद आत्ताच कशाला? सध्या मात्र लोकांना अपयशाचं खापर फोडायला आम्ही एक जागा झालो आहोत. इतकंच, विनाशकाळाच्या वावटळीत क्षत्रिय संहार झाला, आणि त्यात सारे कौरव मरून, पाण्डव जगले, तरिही त्यात वाईट काय? क्षत्रियांचा मोक्ष धारातीर्थी मरणांतच असतो. केवळ मरणाच्या भयानं मी कर्तव्यच्युत होईन, ही कल्पनाच मुळी अस्थानी आहे. बोलून चालून मी शिपाई गडी! मला मरणाची कार्य पर्वा? जगावं सुखांत जगावं, म्हणूनच शिपाई गडी मरणाला मिठी मारतो. तेच त्याचं व्रत, तोच त्याचा धर्म नि तोच त्याचा मोक्ष.
कृष्ण : कर्णा, तू आपल्या सात्त्विक तेजानं या कृष्णाला अगदी दिङ्मूढ केलंस.
कर्ण : पुरुषोत्तमा, दिङ्मूढ होऊ नकोस. तूच दिङ्मूढ झालास तर या महायुद्धाचं सारं चैतन्यच नष्ट होणार! पाया पडतो. कृष्णा, असं करू नकोस. तू पाण्डव-पक्षाचा प्राण आणि अर्जुनाच्या पराक्रमाचा दिव्यात्मा. त्याला नीट धीर देऊन, त्याच्या वीरश्रीला उत्साहाच्या चैतन्यानं थरारवून सोड. प्रणीपातपूर्वक त्या धनंजयाला माझा निरोप सांग. की उद्या तुझ्या शक्तियुक्तीची कमाल करून, शुद्ध धर्मयुद्धानं या कर्णाशी चांगला ठाकठिकीचा सामना दे.—
मी जिष्णुतें न वधितां उद्या न मागें फिरेन ही वाचा ।
साची असो असावा निश्वयचि तुझा मनुष्य-देवाचा ॥
- कर्णार्जुन-युद्ध हा भारतीय इतिहासात न भूतो न भविष्यति असा क्षात्रकर्माचा पहिला आणि अखेरचाच सामना होणार असल्यामुळं, अर्जुनाला सांग, द्वैरथ युद्धांत स्थितप्रज्ञ बुद्धीनं या कर्णाला तूं सामोरा ये.
यदुकुलनाथा कृष्णा पार्थाशी संगरांगणामाजी ।
घालीन गाठि त्यातें मी कीं मारील तो मला आजी ॥
—श्रीकृष्णा, धारातीर्थात मानवी जीवनाचं सोनं करायला निघालेल्या या शिपायी
गड्याला एकदा कडकडून जिव्हाळ्याची शेवटची भेट दे.
कृष्ण : कर्णा (मिठी मारतो.)
कर्ण : कृष्णा—
कृष्ण : आता पुढची भेट?
कर्ण : स्वर्गलोकात!
पहिला अंक समाप्त.
अंक २ रा
प्रवेश १ ला
(हिरडा व आवळकटी बोलत येतात.)
हिरडा : हे पहा आवळकटी, संगीतशास्त्रासारखं नियमबद्ध शास्त्र दुसरं नाहीच. बापाला बाप न मानणाऱ्या राजकारणालासुद्धा वारांगनेची उपमा देतात. कारण, एकदा त्याला रंगढंग-बदलाची हुक्की आली, का सरडासुद्धा शरमेनं कुम्पणाची मजल गाठतो. पण गायनशास्त्रासारखं प्रेमळ शास्त्र, आहा! काय त्याची तारीफ करावी! --त्याचं तेच. म्हणून वारांगनाचशा काय, मोठमोठ्या संभावीत घरांगनासुद्धा गवयाचं अंगवस्त्र बनण्याची धडपड करतात.
बेहडा : (प्र. क.) माहीत आहे. गायनशास्त्राची मिजास! संगीताच्या तानदारीत पागल गवयी सुरावटीला धाब्यावर बसवतात. पण तालदार मृदंग्या "किडान् किडतक कटितक गदिगन धा" च्या एकाच चकरभेण्ड चफराकीत त्या धाब्याचे धाबे दणाणून सोडतो. गवयी बकाल न् बेताल बनला तरी समेच्या अवसानासाठी काळ कोपला तरी मृदंग्या कालात लय घेणार नाही. धुमकिट किटतक ताकिट धाकट—
हिरडा : हलकट छाकट, बस कर कटकट. असल्या आडदाण्ड धसळा मुसळीनं प्रेमाची घुसळणी साधत नसते. समजलास!
बेहडा : अॅ हॅ! नाहीतर नादिर्दिर्दिर तुन्दिर्दिर्दिर, उंदीर धर्धर्, मांजर धर्धर करून आवळकटीच्या प्रेमाच्या घुसळणीचं लोणी मटकवणार वाटत!
हिरडा : अरे शहाण्या, प्रेमाचा मामला सोमलासारखा हळूहळू पचनी पाडावा लागतो. आवळकटी, तुझ्या प्रेमासाठी सांगशील तेवढी नाजूक रागदारीची कसरत करायला या हिरड्याचं नरडं तयार आहे. [तान मारतो.]
बेहडा : कशाला मारतोस लेका माझ्या मुरदंगी थापेपुढे तुझ्या नरड्याची बढाई!
आवळ० : बन्द करा ही थोबाड-पंचविशीची लढाई. एकाशी लग्न न् दुसऱ्याशी प्रेम करण्यापूर्वी मला तुमची जात समजली पाहिजे.
हिरडा : जात? ही कसली नवी अडचण बुवा? प्रेमाच्या बाजारात सुद्धा जातीची घासाघीस आहेच का!
आवळ० : मला प्रत्येकाची जात चांगली कसाला लावायची आहे. नवऱ्यावरून बायकोची जात उच्चनीच ठरत असते. मला उच्च जातवाल्याची बायको व्हायचं आहे.
बेहडा : (स्व.) जातीचा कस आणि कसाची जात, यात होणार अखेर माझा घात.
आवळ० : बोल हिरड्या, तुझी जात कोणती?
हिरडा : माझी? माझी जात--माणूस.
आवळकटी : आणि तुझी रे बेहड्या?
बेहडा : माझी? माझी आवळकटी--नाही नाही. माझी जात नाही का? माझी जात-पुरुष.
आवळ० : पुरूष ही काय जात आहे?
बेहडा : आणि माणूस ही काय जात आहे?
हिरडा : माणूस पुरूष नसतो की काय?
आवळ० : आणि स्त्री ही माणूस नसते की काय?
बेहडा : मग आपण तिघेही जण माणूस जातीची माणसंच आहोत.
हिरडा : पण हे सिद्ध झालं पाहिजे, कसाला लागलं पाहिजे.
बेहडा: हिरडा माणूस असेल, पण पुरूष आहे याला पुरावा काय?
हिरडा :आणि तू पुरूष असलास तरी माणूस आहेस याला पुरावा काय? मी माझा पुरुषपणा कोणालाही रोखठोक पटवून देईन. पण लेका, तुझी माणुसकी पटवायला लग्नाच्या बायकोची सुद्धा छाती धजणार नाही.
आवळ० : पुरुष हा माणूस असतो आणि माणसांतही बायकाप्रमाणं पुरूष असतात. मग त्यांची जात कोणती?
हिरडा : बायकाप्रमाणं असणाऱ्या पुरुषांनी "शिखण्डी" अशी जात सांगावी.
बेहडा : आणि पुरूषी थाटाच्या बायकांनी "बृहन्नडा" जात पैदा करून अर्जुनाच्या अज्ञातवासाचं सार्वजनिक स्मारक करावं.
हिरडा : आपल्या देशात ब्राम्हणक्षत्रियादि जातींचा सुळसुळाट ढेकणा-चिलटा इतका आहे. पण कसोटीच्या मुशीत कोणालाहि टाका, फड्या निवडुंगाच्या बोण्डाशिवाय दुसरं काही हाताला लागणार नाही.
आवळ० : धन्द्यावरून जात का जातीवरून धन्दा?
हिरडा : कुठं लागला आहे याचा नीटसा निकाल अजून? जातीवरून धन्दा ठरवू म्हटलं, तर ब्राम्हण द्रोणाचार्यांनी क्षत्रियाचे धनुष्यबाण हाती घेतल्याबद्दल त्याना शिरच्छेदाचीच शिक्षा ठोठवावी लागेल.
आवळ० : द्रोणाचार्यांचा अखेर शिरच्छेदच झाला.
हिरडा : आणि अश्वत्थाम्याला अश्वत्थ वृक्षाला धनुष्याच्या दोरीनं आवळून बांधून, हत्तीच्या ऐवजी अश्वांच्या टापांखाली तुडवला पाहिजे.
बेहडा : काल संध्याकाळी अश्वत्थाम्यानं जानवं तोडून म्हणे आपली जात टाकली?
हिरडा : कात टाकली म्हणून सापाला कुणी बाप म्हणत नाही.
आवळ० : जानव्याबरोबर त्यानं धनुष्यबाणहि फेकून दिलेले मी पाहिले.
बेहडा : म्हणजे अश्वत्थामा आता ब्राम्हणहि नाही आणि क्षत्रियहि पण नाही.
आवळ० : त्यानी आता जर हातात तागडी धरली, तर त्याला वैश्य म्हणायला काय हरकत?
हिरडा : धन्यावरून जात ठरवायची, तरी सगळा पातळ झुणकाच.
बेहडा : आवळकटी, ही जातीची माती कुटण्याचं काम बेकार कुम्भार सुद्धा पत्करणार नाही. विनाकारण तू या फन्दात पडलीस नि आम्हाला पाडलंस. कपाळावरच्या जातीच्या चिठ्या पाहाण्यापेक्षा, चिट्या टाकून तू आमची निवड करशील, तर त्याला मी आपली एकताली सम द्यायला एका पायावर उभा आहे.
हिरडा : बेहडाच्या सभेला मी यमनकल्याणी टेकू देतो.
आवळ० : लग्नाचा जुगार खेळण्यापेक्षा धडधडीत जुगाऱ्याशी लग्न लावलेलं काय वाईट? डोळे उघडे ठेवून प्राण सोडलेला बरा. पण डोळे मिटून लावलेलं लग्न कोणत्याहि तरुणीला सुखाचं होत नाही.
हिरडा : पण त्यासाठी जातीची माती कशाला चिवडली पाहिजे? जाती-जातीतल्या लग्नाचं आपोआप पोटपाणी पिकतं, आणि बाकीच्या लग्नात, खटपट करून सुद्धा वठून जातं, असं थोडंच आहे! प्रयत्ने वाळूचे कण रगडितां-काय होतं तुला माहीत आहे! सुज्ञास अधिक सांगणं नलगे. कळावे लोभ असावा हे विनन्ति.
आवळ० : गुणकर्माची सुद्धा चौकशी नये? कर्म महाराजांचा तर गुणकर्मावर मोठा कटाक्ष?
बेहडा : ते सुद्धा बिनफोडणीचं आम्बट वरणच आहे. गुणकर्माची टिमकी पुष्कळ पिटतात. पण व्यवहारात तिची किंमत फुटकी कवडी! आजच्या घडीला विदुराइतका साधु पुरुष न् ज्ञानी पंडित उभ्या भरतखण्डात दुसरा कोण आहे? मोठमोठे ऋषी त्याला मान देतात आणि धर्म विचारतात. पण त्याला कोणी ब्राह्मण म्हणत नाही. तो म्हणे शूद्र !बिचारा शूद्राचंहि कर्म करीत नाही. पण त्याचा जन्म आडवा आला नी?
आवळ० : जन्म आडवा आला? जन्मावरून सुद्धा जात ठरत नाही?
हिरडा : तिथं सुद्धा फड़वा निवडुगांची कुंपण आहेच. बेटा आडवा जन्माला आला असता तरी पत्करता, पण लेकाचा जन्म आडवा आला ना! खरं पाहिलं तर धृतराष्ट्र पण्डू आणि विदूर यांचा बाप एकच.
आवळ० : तो कोण?
हिरडा : भारतीय सुप्रजाजनन-शास्त्राचे आद्य उत्पादक महर्षि व्यास. धर्मशास्त्र म्हणते, बापावरून अपत्याची जात ठरवावी पण इथं पाहावं तर सगळा प्रकार निराळा! धृतराष्ट्र आणि पण्डू हे दोघे म्हणे क्षत्रिय आणि विदूर तेवढा शूद्र!
आवळ० : जुलूमच आहे म्हणायचा हा!
बेहडा : जात हाच मुळी मोठा जुलूम आहे. जातीचा जुलूम नि जुलमाची जात. भरतखण्डाशिवाय जगाच्या पाठीवर दुसरीकडे नाही आढळणार.
हिरडा : पण सारा जुलूम मोठ्या लोकांपेक्षा खालच्या लोकांवरच जास्त होतो. जातीच्या उच्चनीचपणाची कसोटी सारी गोरगरीबांसाठी. एवढे मोठे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य! त्यांच्या तोण्डाकडे पाहण्याची पंचाईत, मग तोण्डाला तोण्ड देण्याची गोष्ट कशाला? पण त्यांच्या जन्माच्या भानगडी सान्या फड्यानिवडुंगी.
आवळ० : म्हणजे? आईची भानगड, का बापाची भानगड?
हिरडा : सगळीच भानगड आईबापाच्या विवाह संस्काराशिवाय अपत्यांची बीजक्षेत्रशुद्धी समाजात कोणी मानीत नाही. पण इथे तर एकाच्याहि आईचा न् बापाचा पत्ता नाही, तर कसला विवाह न् कसला संस्कार!
बेहडा : तशात स्वर्गपृथ्वीवर येरझारा घालणान्या देवांगना आणि अप्सरा यानी तर अगदी भंडावून सोडलं आहे. जरा कुठं कोणी डोळे मिटून गोमुखीत हात घातला रे घातला की चिकटल्याच या त्याच्या पाठीला नाहीतर पोटाला?
हिरडा : राण्डेच्या पृथ्वीवर पोरं टाकतात आणि स्वर्गाला पळतात!
बेहडा : झुम्बरीच्याना प्रेमाचा वेताळ चाळा, पण पोरांची बाळन्तपणं निस्तरायचा कण्टाळा! यानी पोरं टाकावी नि पशु पक्ष्यानी त्यांची बाळन्तपणं न बारशी करावी. विश्वमित्र मेनकेच्या पोरीचं शकुन्त पक्ष्यानी नाळवार करून, शेवपवणी पाजलं आणि बारशाला तिचे नाव शकुन्तला ठेवलं.
आवळ० : माणसापेक्षा आपल्या देशातले पशुपक्षी सुईण कामात चांगले प्रविण दिसतात.
हिरडा: टाकलेल्या पोरांचं नाळवार कोणीतरी करतोच! आई पळाली स्वर्गाला, बाप गेला तपाला आणि पोरगी चिकटली कण्वाच्या झोळीला.
बेहडा : अमृत पिणाऱ्या देवाना बगल मारून, सोमरस ढोसणाऱ्या माणसांची या अप्सराना काय चटक लागली असेल ती असो. राण्डेच्या वाटेल त्याला आधी चटक लावतात आणि लव्हाळं भर रंगात आलं का चटकन् चटका लावून झटकन फरारी होतात!
हिरडा : पोर तेवढं फायद्यात!
आवळ० : या पेक्षा त्या मेल्या अप्सरा देवांगना एकाच यजमानाला चिकटून कां राहात नाहीत?
बेहडा : याचा खुलासा काढायला इथं मरून स्वर्गात इंद्राची गाठ घेतली पाहिजे. पुरुषांची मनधरणी कितीही सरस असली, तरी या चंचल चिचुंद्र्या त्यांचा नेहमीच विरस करतात.
आवळ० : यात त्या देवांगनापेक्षा तुम्हा पुरुषांचाच गाढवपणा नाही का दिसूनयेत?
बेहडा : तो कसा काय? आम्हा गाढवांची लाळघोटणी करायला येतात कशाला या गाढविणी?
आवळ० : लग्नाच्या गाठीत चांगल्या कचकचीत आवळल्याशिवाय, कशाला करता तुम्ही त्यांची प्रेमचाटणी?
हिरडा : धडधडीत लग्नं लावली, तरी या अप्सरांचा चौण्ढाळपणा कुठं जातो? मागं कोण एक गंगाभागीरथी आली. तिनं शन्तनू राजाशी लग्न लावलं. कोणी झाला तरी वंशवेलाच्या विस्तारासाठीच लग्नाच्या फन्दात पडतो.
बेहडा : नुसता हळदीचाच सोहळा उरकायचा, तर सोमरसाच्या चार पात्रांत कुठेहि भरगच्च उरकता येईल.
हिरडा : त्या बाईनं होईल ते पोर नदीत बुडवण्याचा सारखा सपाटा चालवला. झालं पोर का टाक नदीत झालं पोर का टाक नदीत.
आवळ० : उघड नवऱ्याच्या उघड बायकोला अशीं पोरं मारण्याचं कारण काय?
बेहडा : लहरी बायकांची लहर. दुसरं काय?
हिरडा : बिचारा शन्तनू अगदी काकावून गेला. प्रामाणिक मेहनत अशी पाण्यात जाऊ लागली, तर कोणाला रडू कोसळणार नाही? त्या महामायेनं एकामागून एक सात पोरांचा असा निकाल लावल्यावर, शन्तनू अगदी ढोपरफुटीवर आला आणि आठवं पोर ती गंगाबाई नदीवर घेऊन जात असता, त्यानं तिचा हात धरला आणि शिव्यागाळी हिसकाहिसक करून ते पोर वाचवलं. ते हे आमचे शरतल्पी पडलेले भीष्माचार्य! शन्तनूनं हात धरून पोर वाचवलं, पण ती गंगाभागिरथी त्याच्या हातावर तुरी देऊन जी निसटली, ती आजपर्यंत बेपत्ता!
बेहडा : बायकांची जातच पळपुटी.
आवळ० : बेहड्या, बघ तू आमच्या जातीवर घसरलास.
बेहडा : मी पुरूष आहे नि पुरुषाच्या पराक्रमाला सध्या एवढाच राजमार्ग खुला आहे.
आवळ० : मेल्या पुरूषाना बायकांचा इतका तिटकारा वाटतो तर ते बायकांसाठी एवढे कां जीव टाकतात?
हिरडा : जीव नकोसा झाला म्हणजे कुठंतरी टाकायचा, तो बायकासाठी देतात. यापेक्षा विशेष गाढवपणा काही नाही. बायकांमुळेच पुरूष गाढव बनतात.
आवळ० : दोन नमुने माझ्यापुढे आहेतच.
बेहडा : बायकांच्या पोटी बायका, आणि पुरुषाच्या पोटी पुरुष जन्माला येऊ लागले, तर पुरुषी पुरुष बायकी बायकांचं तोंडसुद्धा पाहाणार नाहीत. सध्या बायकां प्रमाण पुरुषसुद्धा बायकांच्याच पोटी जन्मत असल्यामुळे, खाण तशी माती नियमानं, त्यांचा ओढा बायकांकडं लागतो. बायकोच्यापोटी जन्मण्यापेक्षा, फड्यानिवडुंगाच्या झुडपात केरकचऱ्याच्या उकिरड्यात, किंवा नदीनाल्यांच्या खबदाडात जन्म झालेला परवडला!
आवळ० : त्यासाठी सुद्धा पुरुषाना बायकांचीच पायधरणी करावी लागते. पुरूष स्वतःला कितीहि मोठे समजत असले तरी बायकांच्या मध्यस्थीशिवाय त्याना जन्मताच यायचं नाही.
बेहडा : बायकांच्या ऐवजी पुरुषांच्या पोटी पुरुष जन्माला येते, तर सध्या पुरुषात जो थोडासा बायलेपणा दिसून येतो, तो खास दिसला नसता. पुरुषांत बायकीपणा घुसल्यामुळंच बायकांच्या लाथा शिव्या खाण्यात त्याना धन्यता वाटते. त्यांनी त्यांना गाढव म्हटले तरी या गाढवांना त्याचं काही वाटत नाही. त्या पेक्षा मरण पत्करलं!
आवळ० : मरणासाठी पुरूष स्वतंत्र असले, तरी जन्मासाठी त्याना बायकांचीच कास धरावी लागते.
हिरडा : लागतेच असा काही नियम नाही, आई बापांच्या भेटीशिवाय आलेली कन्यापुत्ररत्ने सध्या किती तरी आहेत.
आवळ० : काय! स्त्री पुरुषांच्या भेटीशिवाय मुलं होतात? नवलच मेलं!
हिरडा : स्त्री पुरूषांच्या भेटचशी काय, पण कित्येक मोठमोठ्या पुरूषाना नऊ महिन्याची बात तर सोडून द्या.--नऊ क्षणसुद्धा आईच्या उदराचा स्पर्श झालेला नाही. आई आणि बाप नुसते नेत्रकटाक्षापुरते जबाबदार आपल्या द्रोणाचार्यांची उत्पत्ति अशीच चमत्कारीक आहे.
बेहडा : हा बेटा दोणाचार्य आईच्या ऐवजी बापाच्या पोटी जन्माला आला असावा, असं मला नेहमी वाटत होतं.
हिरडा : छे छे! आईला तर त्याच्या जन्माची काहीच दाद नाही. पण बापाला सुद्धा याच्या जन्माची काही कल्पना नव्हती..
आवळ० : द्रोणाचार्यांचा बाप कोण?
हिरडा : भरद्वाज मोठ्ठा तपोनिष्ठ कर्मठ ऋषी दशेन्द्रियांचं दमन करून आत्म्याला ब्रम्हाण्डाच्या कपाटात अडकवून ठेवण्यात प्रवीण! पण मानवी विकारांच्या झपाटणीपुढं करतो काय लण्डी! त्यानं धृतांची नांवाची तुझ्यासारखी एक आवळकटी अप्सरा नदीवर स्नानविहार करीत असताना नुसती पाहिली. तिचं तर या गाढवाकडे मुळी लक्षच नव्हतं. यानं तिला तशी पाहिली मात्र आणि हूं! --केली अर्ध्यप्रदानाला सुरवात. तपोनिष्ठ ऋषीचं अर्ध्यप्रदान ते! फुकट गेलं असतं तर माणसांची गाढव बनून शहरांचें उकिरडे झाले असते! म्हणून त्या भरद्वाजानं आपल्या तपश्चर्येची ती फलश्रुति चटकन् द्रोणांत धरली आणि जेहत्ते काय सांगावी मात, कँ कँ करीत हे आचार्य जन्मले द्रोणांत.
बेहडा : आहे यात आईचा संबंध? बापाचा तरी? कशाचाच नाही, तर स्त्रीपुरुषांचा तरी कशाला? बस्! बस्! जन्म व्हावा तर असा ना पुरुषाची खटपट, ना बायकांची लटपट. तरीच बेटा द्रोणाचार्य पुरूषासारखा जगला न् बाईसारखा मेला. ना जन्माची गडबड, ना मरणाची धडपड.
हिरडा : द्रोणांतून द्रोणाचार्य निपजल्यामुळं, पत्रावळीवर जेवताना माझ्या पोटांत धस्स होऊन, घास घशात घोटाळतो. कुणी सांगावं? पत्रावळीच्या पानागणिक पोरटी होऊन पाठीशी लागली तर ती ब्याद पत्करायची कोणी?
बेहडा : आम्ही माता, सृष्टीच्या खाणी, आमच्या शिवाय सृष्टि चालायची नाही. म्हणून या बायकाना केवढी घमेण्ड! घ्या आता हा पुरावा. किटतक गदिगन किटतक गदिगन धा धा धा, जा मरा, आसावरीत जीव द्या. बायाशिवाय पोरं होऊं लागली. बाप सुद्धा नांवाला- निमित्ताला-कारण. द्रोणाचार्यांनी बायकांच्या आईपणाच्या गर्वाचा चांगला गर्भपात केला. जय द्रोणाचार्यकी जय! ठार मेलास तरी जिते रहो पठ्ठे!
हिरडा : हेचसं काय, पण स्त्री पुरुषांच्या नुसत्या नजरानजरी शिवाय हव्या त्या जड वस्तूतूनही माणसं आता पैदा होऊ लागली आहेत.
आवळ०: हव्या त्या वस्तूंतून! दगड धोण्ड्यांतून?
हिरडा : हो, हो, बाणातून, भात्यातून, कोयत्यातून-
बेहडा : पायातल्या पायतणातून, मसणातून सुद्धा.
हिरडा : कृपाचार्यांचा बाप एका बाणातून जन्मला. आणि त्याच्या पुण्याईपासून कृप आणि कृपी ही जुळी भावंडं बाणांच्या जुडग्यात निपजली.
बेहडा : पुरूष जातीचा जयजयकार! पुरूषाचा विजय असो! आवळकटी, पुरूषाना गाढव म्हणतोस? पाहून घे या गाढवांचा पराक्रम बाणांच्या जुडग्यात जुळ्या पोरांची पैदास! आई बेपत्ता, बापाची अर्ध्यप्रदानापुरती सत्ता, आणि अखेर पोरांवर आल्यागेल्याची मत्ता. बायकाचा गर्व जिरला.
हिरडा : बाई बुवाशिवाय मुलं होण्याची साथ भरतखंडात बोकाळल्यामुळे सहज नुसतं शिकण्याचीहि पंचाईत झाली आहे. न जाणो शिंकेच्या झटक्या सरशी चारपाच कारटी फटकन् निपजायची. रस्त्यांनंसुद्धा सावधगिरीनं, डोळे मिटून, कान बांधून चालावं लागतं. फड्या निवडुंगाच्या झुडपांत कोणाची कमायी, कोणाच्या गळ्यांत पडायची, त्याचा नेम नाही.
आवळ० : आग लागो मेल्या जातीना! जातींचा उच्चनीचपणा ही तरी मेली गुण्डांची गुण्डगिरीच म्हणायची!
हिरडा : अग, कौरव पाण्डवांची राजघराणी म्हणजे अनाथ बालकाश्रमांचे लोकमान्य राजमान्य नमुनेच आहेत भारतीय जातींचा इतिहास म्हणजे छप्पन मसाल्याचा चिवडा !त्यांत सगळं आहे न् काहीच नाही. डोळे मिटून फक्की मारली तर रुचकर लागते. उघडे ठेवून चिकित्सा करा कीं सारे कुझक्या भुईमुगाचे खोमट दाणे! फड्या निवडुंगाच्या बोण्डाशिवाय हाती काही लागायचं नाही. सगळ्यांनी आपली जात `माणूस` अशी सांगितली, तर काय आमच्या माणुसकीचे कोळसे होतील?
बेहडा : त्यापेक्षा "पुरूष" अशी जात सांगण्यात माणूसकी दिसून येईल.
आवळ०: पण मेल्या, बायकांनी "पुरूष" म्हणून कशी आपली जात सांगावी?
बेहडा : तर मग बायकांनी "बाई" जात सांगावी आणि पुरुषानी "बुवा" जात सांगावी. सध्याच्या चार जातींच्या चार कोट चिवड्यापेक्षा, बाई बुवांच्या या दोन ठळक जाती, गजकर्णाऐवजी नायटा म्हणून पत्करायला काही हरकत नाही.
हिरडा : मग उच्चनीचपणाची कोम्बडझुंज खेळायची कशी! जातीची कोम्बडझुंज म्हणजे भरतखण्डाचा प्राण. प्राण गेला तर मढ्याला काय जाळायचे?
आवळ० : नाही तर काय लोणी चोपडून त्याचं लोणचं घालायचं? ज्याचा पराक्रम थोर, तोच माणूस थोर, अशी कसोटी ठरवायला काय हरकत आहे? जातीनं थोर असलेल्या धेण्डापेक्षा, थोर असलेल्या गावगुण्डालाच मी प्रेमदान करीन.
बेहडा : माझ्या गावगुण्डीचा पराक्रम दाखवायला, ही पहा माझी कंबर मी कसली.
हिरडा : मी पण आवळकटीसाठी माझी कटी आवळली.
आवळ० : कंबर बान्धण्यापेक्षां तुम्ही आपले डोळे रुमालाने यह बान्धून घेतले पाहिजेत.
हिरडा : डोळे घट्ट बान्धून घेतले पाहिजेत?
बेहडा : ते कशाला? हा काय बुवा आंधळ्या कोशिम्बिरीचा खेळ?
आवळ० : आंधळ्या प्रेमाची शिकार डोळे मिटून करावी लागते, समजलात? तुम्ही दोघे दोन बाजूला-हां, असे चिकटून नाही-लांब दूर उभे रहा. मी अशी मधोमध उभी राहीन. मी इषार देताच प्रत्येकानं माझी प्रेमयाचना इतक्या उच्च अलंकारिक काव्यमय वाणीनं केली पाहिजे कीं, उपमा अलंकारासाठी भावी कवीनी रानोमाळ भीकच मागितली पाहिजे. प्रेमयाचनेच्या अवसानांत येता येता, बडे बापके बेटे नाटकी गोण्डस पोऱ्यावर जसे हुरळून पडतात, तसा जो कोणी आस्ते कदम मला नेमका स्पर्श करील, त्याला मिळेल माझ्या प्रेमाचा मान, उरल्या गाढवाची मी लग्नात अडकवीन मान. आहे कबूल?
दोघे : कबूल, कबूल, कबूल.
आवळ० : चला मी आता तुमचे डोळे बांधते. (तसे करते) याला म्हणतात तेल्याच्या बैलाची अंधारी.
बेहडा : हिरड्या, संभाळ लेका. एका घाण्याभोवती दोन बैलाची भिंगरी.
हिरडा : बेहड्या, घुसळखांब संभाळ. नाहीतर व्हायची दोघांची चेंगराचेंगरी.
आवळ० : हां, असे नीट उभे रहा. हां, करा प्रेमयाचनेच्या पुराणाला सुरवात. [टाळी वाजवून] एक, दोन, तीन. [जाते.]
हिरडा : हे नादब्रह्म-सुन्दरी, तुझ्या जिवाच्या षड्जासाठी माझ्या पंचप्राणाचा पंचम पणाला लावून यमन कल्याणांत नरडे ताणायाला मी तयार आहे.
बेहडा : गुडुम कुडबुड् गुडूम गुडबुड् डमरूप्रमाणे आवळकटी असणाऱ्या झम्पक थै थै देवते, माझ्या मृदंग-जीवनाच्या नाड्या करकचून आवळणारी तू रंगीत खुण्टी आहेस.
हिरडा : हे सप्तस्वर-निनादिनी आसावरी, तुझ्या प्रेमाच्या कोमल स्वरांच्या पट्ट्या सतारीच्या पडद्यांसारख्या दिलपसंत दावून तीव्र मध्यमावरच कोमल धैवताला मी उमटवीन.
[जटा दाढी मिशी इ. भटाचा वेष घेतलेली आवळकटी गुपचुप प्र. क.)
बेहडा : प्रेमाच्या रिंगणात बेताल बनणाऱ्या हे त्रिताल सुंदरी, तुझ्या प्रेमाच्या ``किटतक गदिगन धा"साठी माझ्या मुरदंगी मुरडीचा घोडा, ध्रुपद अस्ताईच्या सुरफाक्ता मैदानावर चौताल सोडायला, हा झपताल्या बेहडा एकताल तयार आहे.
हिरडा : (स्व.) जवळ आलीशी वाटते. आता मारावीच मिठी.
बेहडा : (स्व.) आली वाटतं जवळ. हूं बेहड्या आवळ.
[दोघेजण एकमेकाना `आवळली रे आवळली` म्हणून मिठी मारतात]
आवळ० : (पुरुषी आवाजात) धि:कार धिःकार तुम्हा प्रेमवेड्यांना.
[त्याच्या डोळ्यांचे रुमाल सोडते.]
बेहडा : अरेच्चा! हिरडाच बेहड्याला चिकटला.
हिरडा : हा कोण पाण्ढरा बोकड मधि घुसला?
आवळ० : व्यास महर्षींचा पट्टशिष्य.
बेहडा : आवळकटी कुठं गेली?
आवळ० : अरे ती देवांगना, तिने नाकीं गमन केलें.
हिरडा : मघाशी नाकात काहीतरी वळवळलं खरं.
आवळ० : मूर्खा, नाकीं म्हणजे स्वर्गी. अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मन्दोदरी, या पाच महासतींच्या आळीला राहाणारी ती अप्सरा आवळकटी, तुम्हा मानवांच्या कारट्यांना तपश्चर्येशिवाय प्राप्त होणार नाही. मिटा डोळे. [दोघे डोळे मिटतात. आवळकटी पळून जाते. ]
बेहडा : डोळे उघडू का बुवाजी?
हिरडा : (डोळे उघडून) बुवाजी पण गुप्त! बेहड्या, आवळकटीशिवाय हिरड्या बेहड्याची काय किंमत?
बेहडा : भरतखण्डाला त्रिफळाचूर्णाचे भाग्य देण्यासाठी, तुला नि मला आता अरण्यवासच पत्करला पाहिजे.
हिरडा : चला. आले आवळकटीच्या मना, हिरड्या बेहड्याचे चालेना!
(दोघे जातात.)
प्रवेश २ रा
स्थळ--स्थिती व पात्रें :-- उगवत्या सूर्याला कर्ण अर्ध्य देत आहे. हातात पंचारति व पुष्पहार घेऊन आवळकटी समोर उभी आहे. कर्णाच्या पाठीमागे कुन्ति दूर येऊन उभी राहते. पण तिच्याकडे कर्णाचे किंवा आवळकटीचे लक्ष नसते.]
कर्ण : आहा! सूर्योपासना होताच समोर पंचारति! मंगल दिव्य तेजा, तुला प्रणाम
असो.
आवळ० : वसुन्धरा राणीसाहेबांनी महाराजाना हा शकुनाचा पुष्पहार न् पंचारति पाठवली आहे.
कर्ण : माझ्या वसुन्धरेनं पुष्पहार न् पंचारति पाठविली? आहा! आज मी खास अर्जुनवध करून दुर्योधनाला धन्य करणार.
आवळ० : अर्जुनवधाच्या यशानं धन्य होणाऱ्या अंगराजाचं स्वागत करायला महाराणीसाहेब उत्सुक होऊन बसल्या आहेत. [पंचारति ओवाळून पुष्पहार घालते.]
कर्ण : आवळकटी, या युद्धोन्मुख वीराचा त्या वीरप्रसू, वीरांगनेला प्रणाम सांग. आणि म्हणावं, द्वैरथ युद्धांत अर्जुनाशी भिडण्यापूर्वी, आपण पाठवलेल्या या तेजाळ पंचारतीननं माझ्या उत्साहाला तेज चढलं आणि या टवटवीत सुवासिक फुलांच्या पुष्पहारानं माझ्या वीरश्रीला वासन्तिक बहराचं चैतन्य दिलं, राणीला आणखी सांग, आज या कर्णाच्या जीवनसाफल्याचा सोक्षमोक्ष लागणार आहे. प्रतिज्ञेप्रमाणं युद्धात मी अर्जुनाला ठार मारलं किंवा मारतां मारतां मर्दाच्या मरणानं धारातीर्थी मी मोक्षाला गेलो. तरीही माझ्या राजघराण्यानं आणि विशेषतः माझ्या प्रिय सूतादिक शूद्र समाजांनी त्या मंगल सोहाळ्याचा उत्सव कराया. बरं, युवराजाची तयारी कुठवर झाली?
आवळ० : बाईबाई बाईबाई! सारी रात्र तयारी न् तयारीच चालली होती. आत्ता मोठ्या पहाटेला वृषसेन महाराजांनी मंगलस्नान केलं आणि मातोश्रीचं दर्शन घेऊन स्वारी रथांत बसून पथकासह समरांगणाकडे गेली.
कर्ण : आमच्या भेटीची धाकट्या सरकाराना आठवणच झाली नाही की काय?
आवळ० : आठवण कशी होणार नाही सरकार! आजच्या युद्धांत हुजूरकडून अर्जुनवध होण्यापूर्वीच, नकुल सहदेवाला ठार मारून महाराजाना मुजरा करीन. नाहीतर धारातीर्थी देह ठेवून देव दानव मानवांचे मुजरे घेईन, अशी युवराजानी वसुन्धरा मासाहेबापाशी प्रतिज्ञा केली आहे.
कर्ण : शाबास वृषसेना शाबास! एकूण आज पाण्डवांपैकी तिघेजण तरी ठार मरणार, किंवा कर्ण सुपुत्र धारातीर्थी देह ठेवणार!
कुन्ति : इडापिडा टळो, अमंगल पळो!
आवळ० : अगबाई! माग कुणी तरी उभं आहे.
कर्ण : (तोण्ड न फिरवता) कोण आहे? कोणी याचक आहे काय?
कुन्ति : होय. याचक आहे.
कर्ण : याचक आहे. याचकाची काय याचना आहे.
कुन्ति : आधी आश्वासन पाहिजे.
कर्ण: कर्णापाशी आश्वासन? आजवर कोणीहि भलाबुरा अतिथी या कर्णानं विन्मुख परत पाठवलेला नाही. याचका, तुझी याचना या कर्णाने पुरी केली असं समज. बोल. काय तुझी याचना आहे ती.
कुन्ति : कुन्तीचे पांचही पाण्डव जिवंत रहावे.
कर्ण : कुन्तीचे पांचही पाण्डव चिरंजीव राहावे! (उठून कुन्तीकडे पहातो.)
(आवळ. जाते)
कोण? ओ हो? पाण्डवमाता कुन्ती? या, हा अधिरथ राधापुत्र कर्ण आपल्याला वन्दन करीत आहे. पाण्डवमातेने या सूतपुत्र कर्णाला दर्शन देण्याची आज कां बरं मेहेरबानी केली?
कुन्ति : बाळा कर्णा, तू राधापुत्र नाहीस, या कुन्तीच्या उदरातून जन्मलेला कुन्तिपुत्र आहेस. तू सूतपुत्र नाहीस. पाचहि पांडवाच्या पूर्वी या कुन्तीचा कुसवा धन्य करणारा पहिला पाण्डव आहेस.
कर्ण : कृष्णानं मला ही कहाणी नुकतीच सांगितली.
कुन्ति : पण ती आता मी तुला स्वतः सांगायला आले आहे. ती ऐकल्यावर तुझ्या आजच्या प्रतिज्ञेचा फोलपणा तुला पटून, तिचा तू त्याग करशील.
कर्ण : प्रतिज्ञेचा उच्चार झाल्यावर तिच्या पापपुण्याचा विचार धनुर्धर कर्ण करीत नसतो.
कुन्ति : म्हणून काय, सख्ख्या पाठच्या भावाच्या वधानं तूं आपल्या बीजाशी बेइमान होणार?
कर्ण : बीजापेक्षा ब्रीदाची किंमत मला विशेष वाटते. बीजाची चौकशी करण्याची मला कधी गरजच पडली नाही आणि मला तिचं महत्त्वही वाटत नाही.
कुन्ति : बीजाशी बेइमानी कुन्तिपुत्र कर्णाला तरी शोभणार नाही.
कर्ण : `कुन्तिपुत्र कर्ण` हा प्रेमाचा नवीन जिव्हाळा मला तर राजकारणी डावपेचाचा नवीन हंगामी शोध दिसतो.
कुन्ति : नाही, बाळा कर्णा, मुळीच नाही. लहानपणीं दुर्वासमुनींनी प्रसन्न होऊन मला वशिकरणाचा एक दिव्य मंत्र दिला. हा मंत्र खरा का खोटा, याचा पडताळा पाहावा, म्हणून निव्वळ मौजेनं पण अल्लडपणानं, एक दिवस मी त्याचा जप केला. मंत्र जपण्याबरोबर सूर्यदेवाची मला प्राप्ति होऊन, कुमारी असताच विवाहापूर्वी, बाळ, मला तुझा गर्भसम्भव झाला.
कर्ण : कुन्ति, किती चमत्कारीक तुझं हे बोलणं । कुमारी अवस्थेत विवाहापूर्वीच तुझ्या पोटी माझा गर्भसम्भव झाला, ही गोष्ट मी डोळे मिटून खरी मानली, तरी मंत्र तंत्र जपून, आकाशांतल्या चन्द्रसूर्यांकडून मानवी प्राण्यांना गर्भसम्भव होती, यावर माझा कधीच विश्वास बसणार नाही. यापेक्षा विवाहाला उशीर झाल्यामुळे, सूर्यासारख्या तेजस्वी तरुणापासून तुझ्या उदरी माझी गर्भधारणा झाली, असे स्पष्ट सांगितलंस, तरीही त्यात मला विशाद बाळगण्याचं काहीच कारण नाही.
कुन्ति : बाळ खरोखरच त्यावेळी मी अगदी अल्लड बालिका होते, मला धडपणी काही समजतसुद्धा नव्हतं रे.
कर्ण : अल्लड अल्पवयी बालिकांना गर्भधारणा कधी सम्भवते काय? उगाच हवं ते बोलण्यांत अर्थ काय? काही ठराविक मर्यादेपर्यंत स्त्रियांची शारिरीक वाढ झाल्याशिवाय कामविकार, संभोगेच्छा आणि गर्भधारणा ही सम्भवतील तरी कशी?
कुन्ति : पण हा चमत्कार झाला खरा. बाळा, मी तुला खोटं कशाला सांगू?
कर्ण : चमत्कार? निसर्गाविरुद्ध चमत्कार? कोण यावर विश्वास ठेवील? पण मीच मुळी तुझ्या तारुण्यसहज कामेच्छेबद्दल यत्किंचितही तुला दोष देत नाही, तिथं तू तरी आडपडद्यानं कशाला वाद घालतेस? समाज बंधनाना तू भीत असलीस तरी या कर्णापुढं तुला पूर्ण अभय आहे. संकोच न बाळगता काय सांगायचं ते सत्य न् स्पष्ट सांग.
कुन्ति : बाळ, माझा निर्वंश होण्याची वेळ येऊन ठेपली. आता कसला नि कशाचा मी संकोच धरु? वशिकरणाचा मन्त्र जपण्यात, जिज्ञासा तर तृप्त व्हावी, पण दुर्लौकिक तर होऊ नये, एवढीच माझी विवंचना होती.
कर्ण : निसर्गान निर्माण केलेली जिज्ञासा पुरविण्यात दुर्लौकिक कसला? आणि लौकिकाचीच चाड बाळगायची, तर निसर्गाची तरी पर्वा कशाला? मातोश्री, निसर्ग प्रत्ययी असतो आणि लौकिक परिपाठी असतो. प्रत्यय पहावा तर परिपाठ साधत नाही आणि परिपाठाची पाठ धरावी तर प्रत्यय घेता येत नाही.
कुन्ति : मी दोन्हीही साधण्याची धडपड केली, आणि त्यांत बाळा कर्णा, मी तुला जन्माची मुकले! नावलौकिकवान् कुन्तिभोजाची मी राजकन्या. माझ्या मूर्खपणामुळे बापाच्या नावाला कलंक लागू नये आणि मलाही लोकांनी नांव ठेवू नयेत, म्हणून बाळ तुझा जन्म होतांच नाळ भरला, तुला मी गंगेच्या ओघात सोडून दिलं!
कर्ण : मातोश्री, स्वतःच्या न् थोर बापाच्या सामाजिक लौकिकासाठी आपण माझी गर्महत्या केली असती तरी परवडली असती. पण तुझ्या भाग्यवान् उदरीचा संपूर्ण गर्भवास भोगून जन्माला आल्यावर, तू या तुझ्या पुत्राचा गंगेच्या ओघात निर्दय त्याग करावा? कुन्ति माणसाच्या भयानं माणूसकीला बेमान बनलीस, तरी भूतदयेचा चटका सुद्धा त्यावेळी तुझ्या काळजाला बसू नये आ?
कुन्ति : त्या वेळची माझ्या काळजाची कालवाकालव मी कोणत्या शब्दांनी तुला सागू?
कर्ण : आई, कामविकार आणि संभोगेच्छा हे जर पाप नाही, तर त्याचा निसर्गसिद्ध परिपाक जो कन्यापुत्र-जन्म तोच तुम्हाला पापी कसा वाटतो?
कुन्ति : पण बाळ समाजबन्धनापुढं भूतदयेलासुद्धा दगडाच्या काळजावर आपली धार बोथट पाडून नाही का घ्यावी लागंत?
कर्ण : निसर्गाला पाठ दाखवणाऱ्या भूतदयेचा परमेश्वरसुद्धा धि:कारच करील. परमेश्वराहून निसर्ग काही निराळाच असतो की काय! मातोश्री, निसर्ग हाच परमेश्वर आणि त्याच्या प्रेरणा याच ईश्वरी प्रेरणा. सनातन सिद्धान्त मानवांच्या गळी उतरेल, हा तर ही वसुन्धरा सौख्याची न् सौभाग्याची दिवाळी अखण्ड साजरी करीत राहील.
कुन्ति : निसर्गधर्माप्रमाणं माणसाचं वर्तन कितीहि निर्दोष असलं, तरी त्याला समाजधर्म म्हणून नको का काही पाह्यला? तुझ्या जन्माच्या वेळी माझा विवाहसुद्धा झालेला नव्हता.
कर्ण : नसला म्हणून काय अपत्यहत्या करायची? तरूण तरूणींच्या निसर्गसहज प्रेमानं, विवेकाच्या मर्यादेतच आपल्या निसर्गसुंदर चारूशीलाचा विकास करावा, एवढ्यासाठींच समाजानं विवाहाचा प्रघात सुरू केला. ही मर्यादा जाणून अगर नेणून लाथाडली गेली, तर त्याचं प्रायश्चित त्या निष्पाप बालकानं कां म्हणून भोगाव? मातोश्री, कामेच्छा ही अन्नपाण्याइतकीच निसर्गसिद्ध जरूरीची बाब आहे, आणि तिला प्रतिबन्ध करण्याचा कोणालाहि अधिकार नाही. ही इच्छा पूर्ण करून घेतांना स्त्रीपुरूष जर निसर्गधर्मानंच वागतात, तर अपत्यपालनाच्या वेळीच त्यांना लौकिकी समजुतीचं एवढं भय का वाटावं? अविवाहित तरूण कुमारिका किंवा तरूण विधवा-कोणीहि असो-निसर्गप्रेरणेच्या कोणत्याहि कृत्याबद्दल त्यांनी लोकमताला बाचकणं, हो परमेश्वराविरूद्ध भयंकर गुन्हा आहे.
कुन्ति : पण अब्रूची चाड न बाळगून कसं चालेल? त्या माणसाला समाज सळो का पळो करून नाही का सोडणार?
कर्ण : करील, अगत्य करील. हवी ती निन्दा, बेसुमार उपहास आणि अमानुष छळ करील. पण निसर्गाचा धर्म हे पाप नाही, इतक्या आत्मविश्वासान त्या निन्देला, उपहासाला नि छळाला निमूटपणं तोण्ड देऊन जी अपत्यसंगोपन करील, तिलाच निसर्गधर्माच पावित्र्य उमगल आहे, असं मी मानतो. जिवन्त नवऱ्याच्या नावानं कपाळभर मळवट फांसून कन्यापुत्रांच्या टोळ्या जगापुढं मिरवणाऱ्या सधवेपेक्षा पुनर्विवाहाचा प्रतिबन्ध करणाऱ्या जुलमी समाजापुढं, त्याचा हवा तो राक्षसी रोष सहन करून, आपल्या पोटचा गोळा धिटाईन नाचवणाऱ्या विधवेच्या मनोधैर्याची मी तारीफच करीन. तीच खरी माता न् तिलाच जगात जगण्याचा वास्तविक खरा अधिकार. बालहत्येसारखं अक्षम्य पाप करून आपल्या पापावर पांघरूण घालण्यापेक्षा, सामाजिक छळाला धैर्यानं तोण्ड देऊन, आपल्या पोटच्या गोळ्याचं प्राणापलीकडं संगोपन करण्यांतच स्त्रियांच्या मातृहृदयाची थोरवी आहे.
कुन्ति : पण लोकमताला धुडकाऊन कुमारिकानीं आणि विधवानी आपापलीं मुलं कडेवर घेऊन कशी खेळवावी?
कर्ण : का खेळऊ नयेत?
कुन्ति : लोक काय बोलतील?
कर्ण : झक मारतात लोक! लोकांना भिऊन निष्पाप बालकाची प्राणहत्या किंवा भ्रूणहत्या? त्यापेक्षा लोकमान्यतेची हत्या झाली तरी बेहत्तर! निसर्गाशी विसंगत. असणाऱ्या समाजनियमांना लाथेखाली तुडविण्यांतच माणसाची खरी माणुसकी सिद्ध होत असते. मातोश्री, सामाजिक नियमांची मातब्बरी ती काय! ते हवेसारखे हवे तेव्हा नेहमी बदलतच असतात. पण निसर्गाचे नियम अखण्ड सनातनच असतात. या सनातनधर्माची पर्वा न बाळगतां, क्षणभंगुर अशा सामाजिक बन्धनांच्या खोडसाळ मुवर्तीसाठी, पोटच्या गोळ्याचा घात करणाऱ्या बायकाच समाजस्वास्थाला कीड लावणाऱ्या अवदसा समजल्या पाहिजेत.
कुन्ति : बायकांच्या बुद्धीला इतका खोल विचारांचा पोच कुठून असणार बरें बाळ!
कर्ण : मातोश्री, हा विचाराचा न् विद्वतेचा प्रश्न नाही. काळजाचा प्रश्न आहे. पशूपक्षीचसे काय किडीमुंग्यासुद्धा उपजत बुद्धीनं अपत्य-संगोपन करीत असतात. पण मनुष्यांत ही उपजत बुद्धी असून, शिवाय त्यांत विवेकाची भर पडलेली आहे. अशा विवेकप्रधान मानवांनी सामाजिक धास्तीच्या सबबीवर बालहत्या करावी? हरहर! पशूंनीसुद्धा कींव करण्यासारखा माणुसकीचा हा -हास, वेळीं पाशवी पुरूषांना परवडला तरी तो तुम्हा मातृहृदयी स्त्रियांना सहन तरी कसा होतो?
कुन्ति : आधीच आमचं सारं जिणं पुरुषांच्या आधीन आणि समाजनियम ठरवण्याचं कामहि त्यांच्याच स्वाधीन. म्हणून म्हणते, अडलेल्या नि नाडलेल्या बायका जर बालहत्या करीत असतील, तर त्याची जबाबदारी पुरूषांवरच नाहीं का पडत?
कर्ण : मातोश्री, खरं पाहिलं तर मानवी संसारांत पुरूषांना असं काय महत्त्व आहे! स्त्रिया याच मानवी सृष्टीच्या संगोपन करणाऱ्या जीवन-देवता माता आहेत. त्यांच्या मातृहृदयाच्या अस्मानफाट व्यापकतेला नि दिलदार श्रीमन्तीला कशाची जोड नाही नि तोडहि नाही. स्त्रियांच्या बिनमोल सहकार्यामुळंच जगांतल्या जीवनकलहांत पुरूष आजवर टिकाव धरून जगला आहे.ज्या घटकेला स्त्रिया आपल्या मातृहृदयाला पारख्या होतील, त्या घटकेला मातोश्री-लक्ष्यांत घ्या-सारी मानवजाती बीबियासकट या पृथ्वीवरून कायमची नष्ट होईल. निसर्गाच्या साम्राज्यात स्त्रियांना जे इतकं महत्त्व आलेलं आहे. ते त्या केवळ वंशवृद्धीच्या खाणी आहेत म्हणून नव्हे; तर परमेश्वरानं त्यांना `मातृहृदय` ही-अनन्यसामान्य देणगी दिलेली आहे म्हणून. माता म्हणूनच स्त्रिया जगाच्या आदराला पात्र होऊन राहिल्या आहेत. पण कुन्ति, ते दिव्य मातृहृदय नेमकं तूं गमावलंस आणि म्हणूनच या मांसाच्या गोळ्याला तू डोळे उघडे ठेवून गंगेच्या ओघांत फेकून दिलास! मातोश्री, आपल्या उदरी माझा जन्म, यांत मी आपला काय गुन्हा केला? त्या सूर्याला किंवा सूर्यासारख्या तेजस्वी तरूणाला-तारूण्याच्या मुसमुसत्या शुद्ध प्रेमाच्या ज्या उमाळ्यानं तू प्रथम भेटलीस, ते तुझं प्रेम या अभाग्याच्या जन्माच्या वेळींच कसं एकदम आटलं? पतिप्रेमापेक्षा अपत्यप्रेम शतपट अधिक,असं म्हणतात. पण तुझा मामला मात्र जगावेगळा खरा!
कुन्ति : पटलं, पटलं, माझं पाप मला पटलं. लोकनिन्देच्या दराऱ्यापुढं माझ्या बालबुद्धीनं कच खाल्ल्यामुळेच माझ्या हातून हे पाप घडलं.
कर्ण : कर्णाची भेट होईपर्यंत मात्र याची तुला जाणीवहि झाली नाही ना? कुन्ति तुला स्त्री हृदय तरी आहे का नाही, याचीच मला शंका येत आहे.
कुन्ति : अशी कशी शंका येते तुला बाळ! आधीच दुःखानं गांजलेल्या आणि पश्चातापानं होरपळलेल्या या अभागणीवर आणखी आग पाखडू नकोस. मी तुझा जन्मतःच त्याग केला-
कर्ण : त्याग? त्याग कसला! माझी बालहत्या केलीस. माझ्या दैवानं मी वाचलो न् तुझा प्रयत्न फसला. पण तुझा हेतू बालहत्येचाच की नाही? बोल. आता कशाला हा शोक न् हे विलाप! ज्यावेळी करायचे तेव्हा केले नाहीस. उलट तुझ्या पापाचं मा माझ्या पदरांत बांधून मला तू जलसमाधि दिलीस. तेव्हा तुला किती हायसं वाटलं! साऱ्या नऊ महिन्याचं पाप गुपचूप गंगेत निपटूनं धुऊन टाकल्याचं समाधान तुला झालं. नाही का? बोल, आता बोल.
कुन्ति : बाळ बाळ, काय बोलू!
कुन्ति : हवं ते बोल, कुन्ति, सगळी पापं पचतात, पण निसर्गधर्माविरुद्ध केलेली पापं अखेर सापासारखी नरड्याला डसतात. आला ना अनुभव?
कुन्ति : पोटच्या गोळ्याची हत्या करू नये, पण बाळ मी के-ली! मला आता क्षमा कर.
कर्ण : मातोश्री, पोटच्या गोळ्याची हत्या हे इतके भयंकर पाप आहे की त्याची क्षमा करायला परमेश्वर सुद्धा समर्थ नाही. त्यांतल्यात्यात लोकमताला किंवा रूढीला भिऊन आपल्या अपत्याचा जीव घेणं, यासारखं दुसरं बदकर्म नाही. अपत्य म्हणजे आईच्या मांसांचं मांस, हाडाचं हाड, रक्ताचं रक्त आणि जिवाचा जीव. त्याच्या रक्षणासाठी त्याच्या पालनपोषणासाठी, त्याच्या वाढीसाठी, जी आपल्या जिवाचं रान करील, डोळ्यांत त्याच्या पंचप्राणाला साठवील नि अखेर त्याच्या जिवासाठी स्वतःच्या जिवावर रखरखीत निखारे ओतून घेईल, ती खरी स्त्री. ती खरी माता आणि ती खरी मानव-देवता. मातोश्री, नवरा मेल्यावर त्याच्या सरणावर उडी घेणाऱ्या स्त्रीचा सती सती म्हणून कोणी कितीहि गौरव केला, तरी त्या तिच्या कृत्यात थोडा तरी स्वार्थ असतोच असतो. म्हणून असल्या सतींचा मला बिलकूल आदर वाटत नाही. मातेच्या अपत्यविषयक प्रेमात स्वार्थाचा लवलेशहि नसतो. पण तू तर केवळ लौकिकाच्या स्वार्थासाठी हा जीता जीव नदीत फेकून दिलास!
कुन्ति : बाळ, बाळ, मी तुझी सर्वस्वी अपराधी आहे, ही जाणीव मरेपर्यन्त माझ्या काळजाचे तुकडे तुकडे करीत राहील. लौकिकासाठी तुला मी टाकले, पण लौकिक तरी कुठं माझ्या पदरात पडला! म्हणजे सगळीकडूनच मी नागावले. पण खरं म्हणशील तर बाळ, स्वतःच्या लौकिकापेक्षा मी माझ्या बाबांच्या थोर राजघराण्याच्या लौकिकाला भिऊनच, या पापाच्या वाटेत पाऊल टाकलं.
कर्ण : आणि म्हणूनच तुझ्या पापाचं स्वरूप विशेष घातकी, राक्षसी न समाजविध्वंसक ठरत आहे. थोर कुळातल्या थोर बापाची थोर लौकिकवान् मुलगी म्हणून ही गोष्ट तुला मुळीच शोभली नाही. ज्या थोरलोकांकडं पाहून बहुजनसमाज सामाजिक नीतीचे धडे गिरवीत असतो, त्या श्रेष्ठांनीच जर असली घातकी बालहत्त्यांची परंपरा चालू ठेवली, तर साऱ्या समाजांचा बुद्धिभ्रंश होऊन, समाजस्वास्थ्याच्या चिन्धड्या चिन्धड्या उडतील, इकडं तुझं लक्ष जायला हवं होतं. कोनाकोपऱ्यातल्या एकाद्या क्षुद्र बाईनं बालहत्या केली तर लोक तिला अडाणी, मूर्ख समजून तिची कीव तरी करतील, किंवा थोडासा धि:कार करून, त्या गोष्टीला विसरून जातील. पण तू तर महाराज कुन्तिभोजाची राजकन्या! तुझ्या हातून घडलेलं हे महापातक, भारतीय स्त्रियांच्या मातृहृदयाला रक्तपितीप्रमाणं भोवल्याशिवाय खास राहाणार नाही.
कुन्ति : बालहत्त्येच्या नादानं स्वतःचा, संसाराचा—
कर्ण : स्वराज्याचा न् अखेर सगळ्या राष्ट्राचा-
कुन्ति : केवढा भयंकर विध्वंस होऊ शकतो, याचा दाखला जगाला पटवण्यासाठीच, परमेश्वरानं या अभागी कुन्तीला जन्माला घातली खास! बाळा, जाणून किंवा नेणून मी जरी मातृहृदयाला पारखी झाले, तरी तू या कुन्तीच्या पोटी जन्मलेला ज्येष्ठ पाण्डव आहेस, ही गोष्ट कालत्रयी खोटी पडणारी नाही.
कर्ण : होय, कुन्ति, मी पाण्डव आहे, ज्येष्ठ पाण्डव आहे. तुझा पुत्र आहे. पण या कुळकथेचा आता उपयोग काय? आजच्या संग्रमात कर्णार्जुनाचा मारीन मरेनचा झगडा सुरू होण्यापूर्वी तू मला दर्शन दिलंस, हे एकपरी चांगलंच झालं.
कुन्ति : तुझं शुभ कल्याण व्हावं, हीच या कर्णमातेची इच्छा आहे.
कर्ण : तथास्तु, तुझा मंगल आशीर्वाद मी शिरसावन्ध मानतो.
कुन्ति : पाण्डवांचंहि या वडील भावानं शुभ मंगल करावं, अशी भी प्रार्थना केली, तर बाळ ती अनाठायी होईल का? बाळा, तुझ्या हातून अर्जुनाचा वध होऊ नये, या एका आशेनं मी तुझ्या भेटीला आले खरी; पण-पण-पण-
कर्ण : पण कसला? कुन्ति, स्पष्ट बोल, भिऊ नकोस.
कुन्ति : शौर्यवीर्यादि पराक्रमाप्रमाणंच तुझ्या बुद्धिवैभवाच्या तेजानं या कुन्तीला तू इतकी कुण्ठित न् मोहित केलीस, की माझी कर्णार्जुनाची जोडी अभंग चिरंजीव राहिलीच पाहिजे, या आशेनं माझ्या काळजात आता पोखरण घातली आहे.
कर्ण : मातोश्री, ही आशा आता फोल आहे. कर्ण किंवा अर्जुन यापैकी कोणी तरी एकानं धारातीर्थी आज देह ठेवल्याशिवाय, या महायुद्धाचा शेवट लागणं शक्य नाही.
कुन्ति : का शक्य नाही? तूच मनावर घेशील तर कर्णार्जुन युद्धाशिवाय या महायुद्धाची समाप्ति होईल.
कर्ण : ती कशी?
कुन्ति : सख्या ज्येष्ठ बन्धूच्या शुद्ध प्रेमानं तू अर्जुनाला मिठी मारलीस तर किती तरी शुभ गोष्टीनी या भरतखण्डाचं भाग्य उजळ होणार आहे. एवढं श्रेय, बाळ, आज तू घेतलच पाहिजेस.
कर्ण : कर्णार्जुन-सन्धीवर भरतखण्डाचं भाग्य कसं काय उजळ होणार?
कुन्ति : कौरवांचा सारा पीळ तुझ्या हिमतीवर-
कर्ण : आणि तो वाजवी आहे.
कुन्ति : ज्येष्ठ पाण्डव म्हणून तू पाण्डवांना सामील झालास, की या मेल्या कौरवांच्या नाड्या तेव्हाच आखडतील आणि महायुद्ध बंद पडून भारतीय क्षत्रियाचा संहार तेव्हाच थांबेल. क्षत्रियांचा सहार ही केवढी भयंकर हानि आहे हे तुझ्यासारख्या राष्ट्रपुरुषाला मी सांगावं असं नाही. ती वाचवून भारताचं भाग्य राखण्याची पुण्याई माझा बाळ नाही का पदरात घेणार?
कर्ण : भारतीय क्षत्रियांची हानि टाळण्याची जबाबदारी माझ्या गळ्यात? कां म्हणून? कौरवांच्या बाजूनं भी पाण्डव-निःपाताला सिद्ध झालो, याला वास्तविक कारण कोण? -तूच हेच नव्हे, पण कौरव पाण्डवांच्या वैराला आणि महायुद्धालाहि कारण तूच-तुझी बालहत्त्या. तू माझा त्याग केल्यामुळं, कीर्तिला नि यशाला एक जन्म तरी मी कायमचा नाही का मुकलो! क्षत्रियांच्या सर्व संस्कारांना पारखा झालो आणि सूतकुलाच्या वातावरणात येऊन पडलो. या एकाच पापामुळं मला पदोपदी किती मानहानी, उपहास आणि त्रास सहन करावे लागले नि लागतात! स्वयंवर प्रसंगीं तुझ्या त्या पांच नवऱ्यांच्या द्रौपदी सुनेनं भर भारतीय राजमण्डळा समक्ष `सूताधम सूताधम` म्हणून या कर्णाचा केलेला उपहास, कुन्ति, तुझ्या कानावर आला असेलच. अशा शेकडो हजारो तेजोभंगाना तोण्ड देण्यातच माझी अर्धीअधिक हिम्मत या जन्मी खर्ची पडली. याला कारण कोण? तूच. हा विचार मनात आला म्हणजे माझा सात जन्माचा कडवा वैरीसुद्धा यापेक्षा अधिक माझं काय नुकसान करू शकेल? तूच सांग, ज्यावेळीं आपले पंचप्राण पणाला लावून तू माझं संगोपन आणि क्षात्रसंस्कार करायचे, त्याच वेळी तू मला उकीरड्यावर फेकून दिलंस, आणि तो काळ निघून गेल्यावर आता तुझ्या पुत्रवात्सल्याला भरती आली!
[दुर्योधन दूर गुपचूप मागें येऊन उभा राहतो. ]
कुन्ति : बाळा, बाळा, माझ्या काळजाच्या चिंधड्या चिंधड्या केल्यास! तुझ्या निर्मळ अंतःकरणाच्या आरशात मला माझं चरित्र स्पष्ट दिसलं! कर्णा बाळा, सारं विश्व मला पेटल्यासारखं दिसतं आहे!
कर्ण : आई. रडू नकोस, घाबरू नकोस. विश्वरूपदर्शनाची कृष्णाची जादुगिरी या कोणाजवळ नाहीं! कदरबाज व्यवहाराचा रोकठोक मामला मी तुला पटवून दिला. आई मला क्षमा कर. अधिक उण्या शब्दांबद्दल मी तुझ्या पाया पडतो.
कुन्ति : ऊठ बाळा ऊठ, माझ्या पातकाबद्दल तू मला हवे ते शाप दे. वाटेल तितकी निर्भत्सना कर, पाहिजे तर तुझ्या खड्गानं माझी मान तोड-
कर्ण : मला तू मातृहत्यारी परशुराम समजू नकोस.
कुन्ति: बाळ, किती झालं तरी पाण्यापेक्षा रक्त केव्हाहि घट्टच असतं. तू माझ्या जिवाचा जीव, प्राणाचा प्राण. बाळ. या तुझ्या मातेच्या रक्ताशी नको तू बेईमान होऊंस. धर्मार्जुन भीमाच्या आंगांत कुन्तीचं जे रक्त खेळत आहे, तेच या माझ्या लाडक्या जिवाच्या नसात नाही का सळसळत? [कर्णाला मिठी मारते. तो `आई` म्हणून कवटाळतो] माझं बाळ ते! बाळ, बाळ, बाळ! (दोघेहि किंचित् मूच्छित.)
दुर्यो० : (स्व.) हा पेच मात्र मोठा बिकट दिसतो. कृष्णाला याने वाटाण्याच्या अक्षतावर वाटेला लावलं, पण हा मातृप्रेमाचा उमाळा अखेर काय करतो कोण जाणे!
कृष्ण : (किंचित डोकावून स्व.) ही पकड आता छान बसली. (जातो.)
कर्ण : आई आई! आऽहाऽ! जन्मदात्या मातेच्या स्पर्शात खरोखरच काही तरी जादू आहे. हिच्या अंकावरच्या माझ्या या भाग्यवान् शयनाचा शेषशायी भगवन्तानं हेवा करावा!
कृष्ण : (पूर्ववत्) यात मुळीच संशय नाही. (जातो.)
कुन्ति : देवा, आज कित्ती कित्ती वर्षांनी माझ्या बाळाच्या अंगस्पर्शानं मी धन्य होत आहे. लोकलज्जेसाठी पोटच्या गोळ्याची हत्त्या करणाऱ्या अभागणीनो, या असल्या सौभाग्यासाठी तरी तुमच्या जिवाच्या जिवाला जपा. देवाघरच्या त्या हिऱ्यामाणकाला प्राणाच्या कोन्दणात ठेवा. माझं बाळ! आहा! सारी माया फुलली न् काया रोमांचानी डवरली! बाळ, तुझ्या या मिठीत मला मरण आलं, तरच रे मी पापीण उद्धरून जाईन.
कर्ण : आई-आई!
कुन्ति : बोल, बोल. ते गोड शब्द पुन्हा बोल.
कर्ण: आई, तुझ्या अंकावर असा मी डोकं ठेऊन पडलो असता, मरणाची भाषा कशाला बोलतेस? आतां सारं मंगल-मंगल-मंगलच होणार.
कृष्ण : (पूर्ववत्) तथास्तु. ( जातो.)
कर्ण : आजच्या संग्रामाच्या मंगल दंगलीत कर्णार्जुनापैकी कोणी तरी एक धरणीमातेच्या अंकावर, अस्साच मंगल शयन करणार. माझ्या आईचा कुसवा धन्य होणार.
कुन्ति : नको नको, बाळ, असं अभद्र काही बोलू नकोस. माझ्यावर रागावलास होय तू? माझ्या पाडसाला उटणं लावून भुडभुड गंगा आंघूळ घातली नाही, माझ्या सोनुकल्याच्या गाली कपाळीं तीट लावली नाही, तुला बाळलेणं चढवलं नाही. गझनीच्या गोण्डेदार कुंचीत गुरफाटून कडी खान्द्यावर खेळवलं नाही. ` लुच्या रे लुच्चा` म्हणून दाटुमाटुचा गालगुच्चा घेतला नाही, म्हणून का माझा राजा माझ्यावर रुसला आहे? आल्या गेल्याची, वाटच्या वाटसराची, घरातली दारातली दृष्ट माझ्या छबड्याला लागेल, म्हणून तुला मी पदराखाली झांकलं नाही, मीठ मोहऱ्यांनीं तुझी दृष्ट काढली नाही, म्हणून का माझा राजहंस माझ्यावर रागावला आहे? बाळ, लौकिकाला भ्याले, माझ्या पाडसाला मुकले, पण तुझ्या प्रेमाला नाही बरं पारखी झाले. पोटांतलं प्रेम ओठांना उमटत नाही, ते या डोळ्यांतून टपटपा गळत आहे. कुन्तीच्या मानस-सूर्या, या अर्ध्यदानानं तरी संतुष्ट होऊन, या अभागिणीवर पुत्रप्रेमाची पाखर घाल.
कृष्ण : (पूर्ववत्) पेचावर सरकगांठ तर छान बसली! (जातो.)
कर्ण : आई. पडू दे. पडू दे, तुझ्या डोळ्यातले ते दिव्य दंवकणाचे थेम्ब या कर्णाच्या मस्तकावर सारखे टपटप पडू दे. त्या तेजाळ थेम्बांच्या किरिटापुढं पृथ्वीच्या साम्राज्याचा किरिटसुद्धा मी तुच्छ लेखतो.
दुर्यो०: [स्व.] मातृप्रेमाच्या मोहनीनं कौरवांचा सेनानि-किरिट सुद्धा तुच्छच लेखला म्हणायचा! कर्णा, अखेर तू सुद्धा भीष्म द्रोणाच्याच वळणावर जाणार आं!
कर्ण : आई, तुझ्या हातची कुरवाळणी म्हणजे या कर्णाला त्रिभुवनाची ओवाळणी आहे. तुझ्या या पाझरत्या डोळ्यांची पिलपिलती नजर, अमरत्वाच्या अमृतानं मला सचैल स्नान घालीत आहेशी वाटते. बालपणींच्या सर्व आठवणींची आंगडीं कुंचलीं घालून, तुझ्या हृदयाच्या पाळण्यांत जो जो गाई करणाऱ्या या तुझ्या कर्णाला, त्याच्या जीवनाच्या अखेरीला दे दे. एकसारखे झोके दे, म्हणजे तुझ्या उष्ण श्वासाबरोबर आपोआप उमटणारीं प्रेमाच्या हुन्दक्याची मुकी गाणीं ऐकत ऐकत लागणाऱ्या गाढ झोपेपुढे, मला मोक्षाची सुद्धा पर्वा वाटणार नाही.
कृष्ण : [ पूर्ववत्] मन्त्र बरोब्बर लागू पडला. पुंगीच्या आलापात नागोबा छान डुलू लागला! बन्सिबहाद्दर कृष्णाच्या बासरीची तान फुकट जायची नाही. [जातो]
दुर्योधन : [स्व.] अखेर कर्णसुद्धा माझी निराशा करणारसा दिसतो!
कुन्ति : बाळ, तू पाण्डव ना? या कुन्तीचा कुसवा धन्य करणारा ज्येष्ठ पाण्डव ना?
कर्ण : आई, हा कर्ण नखशिखान्त पाण्डव आहे, पाण्डव आहे, असं शतवार म्हणतो. मग तर झालं ना माझ्या आईचं समाधान?
कुन्ति : [मिठी सोडून दोघे उठतात.] आहा, आज मी धन्य झाले!
कृष्ण : [पूर्ववत् ] माझ्या श्रमांचं सार्थक झालं [जातो.]
कुन्ति : बाळा कर्णा, तू पाण्डव आहेस. माझी-आईची-आज्ञा म्हणून, आत्ता माझ्याबरोबर आपल्या धाकट्या भावंडांच्या भेटीला चल. पाण्डव पक्षाचा सम्राट म्हणून श्रीकृष्णासकट धर्मभीमादि पाचहि पाण्डव मी तुझ्या पायावर घालते. या मेल्या कौरवांच्या भाडोत्री अभिमानापेक्षा, रक्ताच्या अस्सल जिन्हाळ्यानं तुम्ही सहाहि पाण्डव या कुन्तीचं जीवन धन्य करा.
कर्ण : हां, एवढं मात्र घडणार नाही. आई. हा तुझा आग्रह फुकट आहे तुझ्या प्रेमानं वितळून अगदी सद्भावनेनं आणि तुझ्या आज्ञेनं, कौरवांचा त्याग करून भी पाण्डवांना मिळालो, तर सारे भारतीय क्षत्रिय या कर्णाच्या बीजाची न् ब्रीदाची किती बेसुमार निन्दा करतील, याची तुला जाणीव आहे काय?
कुन्ति : रक्तानं रक्ताला ओळखलं. यांत त्याना निन्दा करण्याचं काय कारण?
कर्ण : कारण काय? आई. तू प्रसंगाचा नीट विचार केला नाहीस या घटकेला हा कर्ण कौरव सैनाचा अधिपति आहे. कौरवांची भाग्यश्री दुर्योधनानं विश्वासानं माझ्या हाती दिलेली आहे. अशा वेळीं नुसत्या जन्माच्या सबबीवर पाण्डवाना मी सामील झालो, तर सारे क्षत्रिय म्हणतील की, `पहा हो. आतापर्यंत पाण्डवांचं भाऊपण याला माहीत नव्हतं. पण त्यांच्याकडं कृष्णार्जुनाची जोडी दण्ड थोपटून सामन्याला उभी राहिलेली पाहाताच, स्वारी भेदरली, आणि भाऊपणाचं नातं उकरून, भ्याडासारखी पाण्डवांच्या आसऱ्याला पळाली.` आई. असला आरोप था कर्णाला क्षणभर सुद्धा सहन होणार नाही. माझं असेल नसेल ते शरीरबल आणि बुद्धिबल एकवट खर्ची घालून आज मी तुझ्या पाचहि पुत्रांशी लढायला कमी करणार नाही. तुझा उपदेश कितीहि कल्याणाचा असला, तरी कौरवांच्या मिठाला न् इमानाला हा कर्ण प्राण गेला तरी बेइमान होणार नाही.
दुर्योधन : [स्व.] शाबास, कर्णा शाबास!
कृष्ण : [पूर्ववत्] येताळ पूर्वस्थळावर आला! [जातो.]
कर्ण : तुझे पाच पुत्र या कर्णाला संग्रामात भारी आहेत, असं मुळीच नाही. यादव कृष्णाच्या कपट नीतीची कास न धरता, क्षत्रियोचित युद्धधर्मानं ते जर मला सामना देतील. तर आई, पुरती खूणगाठ बांधून ठेव, त्याना ढेकणासारखा सहज लीलेनं चिरडून टाकायला हा कर्ण समर्थ आहे.
कुन्ति : ही माझी बालंबाल खात्री आहे. म्हणूनच बाळ, माझा निर्वंश टाळण्यासाठी मी तुझ्या भेटीसाठी इतकी धडपडत आले. पूर्वी लौकिकासाठी मी तुझ्या जिवावर तुळशीपत्र ठेवले, आता तुझ्या सकट पाचहि पाण्डवांच्या जिवासाठी मी माझ्या लौकिकावर निखारे ठेवायला तयार आहे. एवीतेवी लौकिकाला भीत असतानाहि जर माझा दुर्लौकिकच झाला आहे तर कर्ण माझा कानीन पुत्र आहे, असा मीच जाहीर डंका पिटून, तुझा अस्सल पाण्डवपणा सिद्ध करते, मग नाही ना तुझी हरकत?
कर्ण : मातोश्री, वेळीं भारतीय क्षत्रिय ब्राम्हणांचे हवे ते आरोप मी निमूट सहन करीन. पण रक्ताच्या नात्यागोत्याच्या किंवा मातापित्याच्या प्रेमाच्या सबबीवर, दुर्योधनाच्या विश्वासाला बेइमान होणार नाही.
दुर्यो० [स्व.] कर्णा, तुझ्या धन्यतेच्या थोरवीपुढं सूर्याचं तेज सुद्धा फिकं पडेल.
कर्ण : धृतराष्ट्र-पुत्रांनी आजवर माझं क्षेम केलं. माझ्या स्वभावजन्य गुणकर्माची बूज राखून मला प्याद्याचा फर्जी केला आणि अखेर माझ्या आत्मविश्वासावर विसंबून सेनानिपदाचा किरीट माझ्या मस्तकावर ठेवला. त्यांचा मी ऐन घटकेला मनोमंग करू? नाही नाही. आई. यावेळी आकाश कडाडून कोसळलं तरी आपल्या कौरवनिष्ठेपासून हा कर्ण रतिमात्र ढळणार नाही. आजपर्यंत ज्यानी ज्यानी दुर्योधनाचे तान्दुळ महाग केले, त्याच्या परीक्षेची वेळ आता आली आहे. अर्थात् प्राणाची तमा न बाळगता, कौरवांच्या उपकारांची फेड घनघोर रणसंग्रामानं आज मला केलीच पाहिजे.
दुर्यो० : [स्य.] कर्णा, तुझ्यावरून हा जीव ओवाळून टाकावा! तू माझा परमेश्वर आहेस.
[आत आकाशवाणी:--" दानशूर कर्णा, देवी कुन्ति तुझी जननी आहे आणि तिच्या आज्ञेप्रमाणं वागलास तर त्यात तुझे कल्याण आहे.]
कुन्ति : ऐक ऐक बाळा ऐक. प्रत्यक्ष सूर्यदेवाची-तुझ्या पित्याची-ही आकाशवाणी ऐक.
कर्ण : मातोश्री ही आकाशवाणी नाही. त्या नाटकी कृष्णाची चेटकी वाणी आहे.
कृष्ण: [प्र. क.] नाही नाही कर्णा, खरोखरच ही आकाशवाणी झाली. किती गंभीर! किती स्पष्ट!
कर्ण : हे तूच सांगायला आलास म्हणून ठीक झालं.
कृष्ण : आकाशवाणी म्हणजे देववाणी. तिचा अनादर कोण करील?
कर्ण : आकाशवाणीनं डळमळणारा आणि कृतनिश्चयापासून ढळणारा नामर्द हा कर्ण नव्हे, हे तुम्हा सगळ्या गारोड्याना आजच्या संग्रमानं मी सिद्ध करून देईन.
कृष्ण : आत्याबाई, कर्णाचे बालपणचे कसलेहि हट्ट तुम्ही पुरवलेले नाहीत. खरं ना? म्हणून त्यानं लाडुकपणाची ही टोलवाटोलव चालवली आहे. बाकी, कर्ण म्हणजे देववाणीचा अवमान करणारा नाही बरं! अगदी खात्री ठेवा. पण मुलानं आपल्या आईजवळ हट्ट धरू नये, तर कोणाजवळ धरावा? असला काही हट्ट, तर पुरवा. मी राहतो जामीन-न् चला हात धरून घेऊन आपल्या शिबिरात. मुलाचा हट्ट आईनी नाही पुरवायचा, तर कोणी? मी?
कुन्ति : माझ्या बाळाचा हवा तो हट्ट पुरवायला मी माझ्या जिवाची कुरवण्डी करीन.
कर्ण : कृष्ण असला की हव्या त्या नाटकाला रंग भरलाच! पण आई, या नाटकाच्या पचनी भी पडेन, ही गोष्ट मात्र दोघेहि विसरा.
कृष्ण : आत्याबाई, हट्ट जरा घट्टच दिसतो पण मायेच्या उबाऱ्यानं वितळेल.
कर्ण : कृष्णा, दगलबाजी करून तुझ्यासारखे लोकमान्य बनण्याचं दुकान नाही मी थाटलं. प्रतिपक्षाला धर्मप्रेमाचं अवसान दाखवून, हवा तो मतलब साधण्याची तुझी ठकविद्या मला पुरी माहीत आहे.
कृष्ण : गरीबावर हा काय गहजब बुवा! मी काय कुणाचं नुकसान केल? नेहमी जुळतं मिळतं घेऊन तण्टे मिटवणारा गरीब मध्यस्थ मी. मायलेकाची दिलजमाई होत असेल तर पोटभर दुध पिणारा मी गवळी. माझ्यापाशी कशाची ठकविद्या?
कर्ण : ठकविद्या? तुझ्यासारखा महाठक पूर्वी झाला नाही नि पुढे होणार नाही. कौरवपाण्डवांचा कलहाग्नि या कुन्तीनं पेटवला आणि कारस्थानांचे फुंकर घालून घालून तू त्याचा हा प्रचण्ड होम भडकवलास. आता या होमात कौरवांचे कोळसे होऊन. विधवा बाया न पोरक्या पोरानी गजबजलेल्या भारताचे पाण्डव जरी स्वामी झाले, तरी तू नि तुझी लोकमान्यता शीरसलामत!
कृष्ण : आत्याबाई, पाहिलंत ना? मध्यस्थाला इकडून थप्पड तिकडूनहि थप्पड! तरी मी होऊन कधी कुणाच्या भानगडीत पडत नाही. नको रे बुवा! पुढल्या जन्मी मेलो तरी कुणाची मध्यस्थि म्हणून करायची नाही.
कुन्ति : कृष्णानं दुर्योधनाचं तरी काय वाईट केलं बाळ? महायुद्ध टाळण्यासाठी शेवटपर्यंत त्यानं नाही का जिवापाड खटपटी केल्या?
कृष्ण : पण लक्षात कोण घेतो? जग हे असं आहे. काय केलं न् काय नाही, हे माझ्या जिवाला माहीत-
कर्ण : का आम्हा कौरवाना माहीत, कृष्णा, तुझ्या दगलबाजीचे न् दगाबाजीचे दाखलेच देऊ लागलो, तर त्याचा एक महाभारत ग्रन्थ तयार होईल.
कृष्ण : सारी दुनिया तो भक्तिभावानं वाचील.
कर्ण : तेवढी छाप लोकावर तू बसवली आहेस खास. असं नसतं तर द्रौपदीवस्त्रहरणाची भाकडकथा कोणा शहाण्यानं खरी मानली असती? द्यूतात जिंकलेली दासी म्हणून हट्टी द्रौपदीला दुःशासनानं दरबारात खेचून आणली. त्या खेचाखेचीत साहजिकच तिचा पदर इकडं तिकडं उडाला असेल. मी म्हणतो उडाला. पण या साध्या गोष्टीवर, कृष्णा, तुझ्या बडव्या भगतानी कल्पनेची भली मोठी इमारत रचून, तुझ्या देवबाजीचं केवढं रे प्रस्थ वाढवलं? काय म्हणे, दुःशासनानं दौपदीचं एक लुगडं फेडताच आत दुसरं तयार. दुसरं फेडताच तिसरं तयार. तिसरं फेडताच चवथं, पांचवं, सहावं-असा हजारो लुगड्यांचा ढिगार पडला आणि शंभर हत्तीचं बळ असलेला दुःशासन म्हणे लुगडी फेडता फेडता थकला. अरे तुमची द्रौपदी म्हणजे काय लुगड्या पातळांचं चालतं बोलतं जिवन्त दुकान होती, का द्रौपदी समजून लुगड्यांच्या लठ्ठ गठ्ठ्याशीच पाच भावानी लग्न लावलं होतं? चमत्कारांच्या बाजारगप्पांवर तुला लोकमान्य देव बनविताना. कृष्णा, श्क्याशक्यतेचाहि तोल तुझ्या बडव्यांना सावरता येऊ नये?
कृष्ण : अरे पण भक्तांच्या पापाचं प्रायश्चित मला काय म्हणून? छे बुवा, मोठेपणा हे मोठ्ठं पाप आहे. कर्णा, मी का त्या मूर्खाना असं सांगायला गेलो होतो? राण्डलेक हव्या त्या गप्पा उठवतात नि मला प्रायश्चित! होतो उद्यापासून मी लहान, त्रास आला या मोठेपणाचा.
कर्ण : पण तुझ्या कर्माचं तरी प्रायश्चित तू घेशील का?
कृष्ण : मी नेहमी निष्काम कर्मच करतो. फळाची आशा करीत नाही, तर प्रायश्चित का?
कर्ण : महायुद्धापूर्वी दुर्योधन आधी आणि त्याच्यामागून अर्जुन, तुझ्या मदतीची याचना करायला गेले. त्यावेळी उशा पायतराच्या बैठकीच्या सबबीवर कौरवांना बाजारबुणग्या यादव सैन्याची आणि पाण्डवाना स्वतः एकट्याची मदत देऊन, तू केवढी दगाबाजी केलीस? सेनापति पाण्डवाकडं आणि सैन्य कौरवांकर्ड! शिराशिवाय धडाचीच देणगी!
कृष्ण : अरे पण, "न धरी शस्त्र करीं मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार" या अटीवरच ना मी गेलो?
कर्ण : मग, भीष्मानं अर्जुनाला शरविद्ध मूर्छित करतांच, हातात चक्र घेऊन कशाला धावलास त्यांच्या अंगावर? कृष्णा, मला असली साजिदे बाजिंदेगिरी साधणार नाही. मी साधासीधा सरळ मनाचा शिपाई गडी. कौरवांचा सेनापति म्हणून आजच्या संग्रामात अर्जुनाला मी ठार मारीन, किंवा मी मरेन. कल्पान्त झाला तरी या निश्चयाचा अणुरेणू आता चळणार ढळणार नाही.
कुन्ति : बाळा. लौकिकाची चाड नि जिवाचं भय न बाळगता, इथवर येण्याचं मी धाडस केलं. त्याचं हेच का फळ आईच्या पदरांत तू घालणार?
कर्ण : आई. तुझ्यापेक्षा मला माझ्या शीलाची किंमत अधिक आहे. पाण्डवपक्षपाती कृष्णाच्या भगत बडव्यांनी आम्हा कौरवांच्या बदनामीचा डंका कितीहि पिटला, तरी एक सत्यवादी, सत्यशोधक आणि सत्यप्रतिज्ञ राष्ट्रवीर म्हणूनच मला भारतीय इतिहासात जिवन्त राहायचं आहे.
[ आत नौबदी, कर्णे, तुतान्या व शिंगें वाजतात. हातांत चाबूक घेऊन शल्य घाईघाईनें प्र० क० ]
शल्य: कर्णा, किती हा उशीर सगळ्या सैन्याची तयारी होऊन ते आघाडीला गेलं, तरी अजून तुझा पोषाख नाही? रथ जोडून तयार आहे, आणि तुझे आवडते पंचकल्याणी अबलक घोडे समरांगणाकडे धाव घ्यायला फुरफुरत एक सारखे थै थै नाचत आहेत. चल चल लवकर. अरे वा! इथं तर एक मोठी परिषदच भरलेली दिसते. काय आहे काय प्रकरण?
कर्ण : शल्या. माझ्या विनंतीला मान देऊन माझं सारथ्य करायला तयार झालास, मला फार आनंद वाटतो. [कुन्तीला] मातोश्री, ही पहा सैन्याच्या उठावणीची नौबत झडली. आपण आता रजा घ्या आणि या आपल्या पुत्राला आशीर्वाद या. [तिच्या पायावर मस्तक ठेवतो. ]
कुन्ति : कर्णा बाळा, तुला काय आशिर्वाद देऊ?
कर्ण : हवा तो दे. मला तो मंगलच होईल. रणक्षेत्री मरणाचा आशिर्वाद दिलास तरीहि तो मी मंगलच मानीन.
कुन्ति: बाळ, काय बोलू? माझ्या काळजाचं काळीज तू! तुला मी जन्म दिला—
कर्ण : आता मरणाचा मंगल आशीर्वाद दे, म्हणजे माझ्या जीवनाच्या दोनीहि टोकाना तू धन्य केलंस, असं मी मानीन.
कुन्ति : चिरायु भव. बाळ ऊठ. तुझ्या उदार चारित्र्यानं मला तू अगदी बुळीबावळी केलीस. तुझ्या भेटीची खूण म्हणून माझ्यावर थोडीशी तरी दया दाखव. निःपाण्डवी पृथ्वी करून, या तुझ्या आईला निपुत्रिका म्हणून नरकाची वाट तरी दाखवू नकोस. दानशूरा, एवढी तरी भीक या भिकारणीला घाल.
[पदर पसरते.]
कर्ण : ज्या उदरातून हा कर्ण जन्माला आला. ती माझी माता भिकारीण? कोण म्हणेल? तुझ्या गर्भवासाच्या श्रीमन्तीनं गर्भश्रीमन्त बनलेला हा कर्ण, तुझी हवी ती इच्छा पूर्ण करील, पण कल्पान्त कोपला तरी पाण्डवांना सामील होऊन दुर्योधनाचा घात मी करणार नाही. [दुर्योधन धावत येऊन कर्णाला कवटाळतो. ]
दुर्यो० : आणि प्राणान्त होईपर्यंत दुर्योधन कर्णाला अन्तर देणार नाही. अंगराजा, तुझ्या निःस्सीम भक्तीनं आणि उदार चरितानं आज सान्या कौरवाना तू धन्य केलंस.
कुन्ति : कर्णा, गी जाऊ ना? मी येताक्षणीच तू दिलेलं पाण्डव-रक्षणाचं वचन फोलच समजायचं ना?
कृष्ण : आत्याबाई, चला परत कसली वचनं नि कसली दानं सारी फोल.
कर्ण : कर्णाचं दान नि वचन फोल? शक्य नाही. आई. पुत्रनात्यानं मी तुला एवढीच आश्वासनाची देणगी देतो की, अर्जुन वजा करून मी कोणत्याहि पाण्डवाशी लढणार नाही. जा आता.
कुन्ति : युद्धात तुझ्या सामन्याला एकटा अर्जुन टिकणार नाही. मग "कुन्तिचे पाचहि पाण्डव चिरंजीव राहतील" या तुझ्या वचनाची वाट काय? कर्णाचा शब्द खरा असेल तर माझे पाचहि पाण्डव चिरंजीव राहिलेच पाहिजेत.
कर्ण : कुन्तीचे पांच पांडव अखेर जिवन्तच राहणार. आजच्या कर्णार्जुन संग्रामांत मी मेलों, तर तुझे पांच पाण्डव जिवन्त राहतील आणि प्रतिज्ञेप्रमाणे अर्जुनाला मी ठार मारले. तरीहि माझ्यासकट पांच पाण्डवांची माता तू राहणारच आहेस. जा. कर्णाचा बोल फोल होणार नाही.
दुर्यो व शल्य : सेनापति अंगराज कर्णाचा जयजयकार!
अंक २ रा समाप्त.
अंक ३ रा
प्रवेश १ ला
[स्थिति : एका बाजूने काथ्याची गुण्डी पेटवून, रस्त्यावर काहीतरी हरवलेले शोधीत आहे, असा बेहडा आणि दुसऱ्या बाजूने खाकेत दारूची सुरई लपवलेला हिरडा येत आहे.]
हिरडा : बेहड्या बेहड्या हो S S तू. अरेच्चा हा आपल्याच नादात! शोधतोय तरी काय? ए बेहड्या! याच्या कानांनीसुद्धा पाहाण्याचं काम पत्करलंय की काय? अरे ए बहिऱ्या कसली, मरण-धुण्डाळी चालवली आहेस?
बेहडा : गप बस जरा बाजूला. घात झाला. हरवली. गेली.
हिरडा : हरवली? गेली? कोण गेली कोण? आवळकटीच ना?
बेहडा : त्रिफळाचूर्ण झालं तिचं. त्या गप्पाळ गंगेचं नाव काढू नकोस.
हिरडा : अरे मग गेली कोण?
बेहडा : तू मधे लुडबुडू नकोस रे बुवा. पायदळी नाहीशी व्हायची. बाजूला हो. डोळे फाडफाडून ताणताणून वासवासून शोधतोय मी. हरवली. घात झाला.
हिरडा : अरे पण हरवली काय-कोण, ते तर नीट सांगशील? नुसतं "हरवली हरवली" करीत, रस्त्यावर कसला हा तमाशा चालवलाहेस हा? हे काय, सारे लोक तुझ्या पागलपणाकडं पाहून हासत आहेत.
बेहडा : लोकांना हसायला काय? डोळे आहेत म्हणून पाहतात अन् बत्तिशी शाबूद म्हणून हासतात. माझं नुकसान भरून द्यायला कुणी थोडाच पुढं येणार आहे! गेली तरी कुठं?
हिरडा : अरे, गेली कोण, ते तर सांग, म्हणजे तुझ्या दोन डोळ्यांच्या दिमतीला माझ्या दोन डोळ्यांची जोडी जोडून, तिचा दुप्पट दुजोऱ्यानं शोध करूं.
बेहडा : [रडण्याचा गळा काढून] हिरड्या गेली रे गेली. या अभाग्याला याच दिवसांत एकाकी सोडून गेली.
हिरडा : [स्व.] याची आई मेली का बायको? [उ.] जाऊ दे बेहड्या, जग म्हंजे पाण्याचा फुगा-रडू नकोस उगा. तुझी आई मेली का बायको गेली? ते नीट सांग: म्हंजे ठरावीक सुरात भोकाडा पसरून, मला तुझ्या सुराला सूर देता येईल. सांग, तुझी आई का मेली?
बेहडा : म्हातारी मरता नयेचि तिजला माता मदीया अशी.
हिरडा : काय? मरता नयेचि तिजला?
बेहडा : होयरे बाबा. म्हातारपणामुळं माझ्या आईला मरायची अगदी ताकदच उरली नाही. फार वर्षे जगण्याच्या सवयीमुळे, सफाईत मरायची हिकमत ती अजिबात विसरली आहे.
हिरडा : मग कोण तुझी बायको का मेली?
बेहडा : अरे बाबा, मेलास तरी असे बोलूं नकोस. मी मरतो. पण बायको जगू दे. तिला अखंड सौभाग्यवती राहू दे. विधवा म्हंजे मेल्या नवन्याचं जिवंत सार्वजनिक स्मारक. ते तरी मला लाभू दे. गेली S S
हिरडा : तुझी एकादी बहीण का मेली? का कुणाचा हात धरून उठून गेली?
बेहडा : बहीण मरती किंवा उठून जाती, तरी हरकत नव्हती. भाऊबिजेच्या छनछनित भवानीसाठी, गावातली हवी ती बया बिनभोभाट गळ्यात येऊन पडती. पण ही-ही-गेली ना!
हिरडा : ती गेली मसणांत नि तू जा सरणांत. पण गेली काय कोण ते तर सांगशील?
बेहडा : अरे बाबा, माझ्या एकट्याची जाती तर नसतो मी एवढा रडलो. पण सगळ्या कौरव पाण्डवांची गेली.
हिरडा : सगळ्या भरतखंडाची गेली. पण काय गेली ते तर सांगशील मसण्या.
बेहडा : तेवढंच नेमकं विसरलो ना मी? मायाजाळ मोठा कठीण आहे!
हिरडा : बेअक्कल गंजड!
बेहडा : अक्कल. अक्कल. आठवली रे आठवली. अक्कलच गेली. अक्कल हरवली.
हिरडा : अन् हा काथ्याचा काकडा पेटवून, तू अक्कल का शोधीत होतास गंजडा? अकलेच्या कांद्या, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य असल्या बड्या धेंडांच्याच नव्हे, तर स्वर्ग पाताळ पृथ्वीच्या अकलेचा खजिना, हा बघ, या हिरड्याच्या बगलेत आहे. मार्ग, कोणे एके काळीं, वाली नावाच्या हुप्या वानरानं, लंकेच्या रावणाला बगलेत मारून, सात वेळा पृथ्विप्रदक्षिणा केली. तसा हा हिरडा, दुनियेच्या अकलेचा रस्सा, अस्सा बगलेत मारून, या कौरव-पाण्डवांच्या समरांगणावर बेरोजगारीं पण्डितासारखा वणवण भटकत आहे.
बेहडा : गिऱ्हाइकच नाही वाटतं! असणार कुठून? गांजा तो गांजा, त्याची सर नाही यायची कुणाला. गुंडी पेटवायची थाथड, का ढोरांच्या मढ्यावर जशी गिधाडं, तशी जमलीच भगतांची गोचिडगर्दी. उगाच नाही मुरदंग्याना गांजाची एवढी भक्ति! चामडे कुठून लाकडाच्या ठोकळ्यातनं बोल काढावे लागतात बोल. धार्किट ताकिट तक-तकचिन धुनुनुनू—
हिरडा : कशाला सांगतोस या महामायेपुढं त्या पागल गांजाचीं मिजास. कौरवांचे सेनापति चिलमीत अडकले म्हणून तर हे महायुद्ध. भीष्मद्रोणानी गांजाऐवजी या दिव्य अर्काची आराधना ठेवली असती, तर कौरव-पाण्डवांत तंटाच मुळी लागला नसता. एका घोटात पोटातल्या पोटात जिरता.
बेहडा : अरे वा! हा मोठा कर्दनकाळ अर्क दिसतो.
हिरडा : हा असा तसा नाहीं. शिंपीभर अर्कात हण्डाभर पाणी मिसळलं, तर त्या तीर्थाच्या प्राशनानं शंभर टोणगे माकडांसारखा वेदघोष करतात.
बेहडा : मग माणसं कसला घोष करतात?
हिरडा : ते सांगण्यापेक्षा ऐकण्यातच खरी खुमारी असते.
बेहडा : यवं रे यवं वल्ली. हिरड्या, तू देव आहेस, ब्रह्मदेव आहेस, महादेव बापदेव आहेस. दाखव दाखव मला तो अकलेचा अर्क.
हिरडा : (सुरई पुढे ठेवतो) अगत्य अगत्य. या पात्राला सुरइ म्हणतात अन् यात जे परब्रह्म आहे. त्याला म्हणतात सुरा.
बेहडा : सुरा? अन् कुणाच्या खुपसायचा तो उरा?
हिरडा : गांजाच्या धुरानं तुझी अक्कल पुरी धुरकटली. ही सुरा म्हणजे खाटकाचा सुरा नव्हे. ही स्त्रीलिंगी. तो असतो पुल्लिंगी. अरे अरे अरे, गंजड लिंगभेदाला सुद्धा पारखेच अं? अरे शहाण्या, “देवीं दैत्यी सागरमंथन पैं केलें" तें सुद्धा विसरलास? सुरा हें त्यातलं चौथं रत्न.
बेहडा : म्हणजे चौदाव्या रत्नाच्या फार पूर्वीचं.
हिरडा : बेहड्या, गांजा सोडून तू आता या अर्काची आराधना चालू कर. मी तुझा गुरु न् तू माझा शिसा. आपण गवई नि मृदंगे एक धंदेवाले. दोघानीं सुरेची एकतान उपासना केली तरच आपले जलसे सुरेल रंगतील. मुरदंग्याचा गांजा न् गवयाची दारू, असला बेताली मामला आता बस्स झाला. मी काशीला नि. तू रामेश्वरला. मी देतो तुला हिची दीक्षा. हिचा एक घोट पोटात जाताच, अकलेचं चक्र भिर्रर्र फिरू लागते. भूत, वर्तमान, भविष्य आरशासारखं स्वच्छ दिसतं. नामर्द मर्द बनतो. अन् मर्दाची मर्दाई वारा प्यालेल्या वासरासारखी बेफाम भडकते. हिचं आकण्ठ प्राशन करणारा भक्त. वामनाप्रमाणे, तीन पावलात पृथ्वी पालथी घालून, चवथ्या पावलांत बळीप्रमाणं पाताळाचा ठाव घेतो.
बेहडा : अरे वा! ही तर मोठी कडकलक्ष्मी दिसते. आजच कुठून बुवा ही एकदम प्रगट झाली?
हिरडा : गांजा ढोसून ढोसून तुझ्या अकलेला गंज चढला, बेहद्या. ही सुरा मुळची. भरतखण्डीच. वेदांच्या पूर्वी हिचा जन्म झाला. फार काय पण, या सुरेच्या सुरातूनच वेदांची उत्पत्ति झाली. प्राचीन आर्यांनी या सुरेच्या तारेतच आपल्या अकलेची तार मिसळून चार वेदांची पैदास केली.
बेहडा : म्हणजे ही देशी देवता आहे.
हिरडा : खास स्वदेशी, शुद्ध औरस भारतकन्या.
बेहडा : या भारतकन्येचं पाणिग्रहण करण्याचा मान, गुरुराज हिरडेश्वर, या आपल्या शिसोत्तमाला आता द्याच.
हिरडा : अवश्य, अगत्य. हे घे पाहिले पात्र. मी म्हणतो मंत्र, तू चालू कर सत्र. "शुभं करोतु कल्याणम्"
बेहडा : हा तर दिवालागणीचा मंत्र.
हिरडा मग चुकलं कुठं त्यात? सुरा ढोसून अकलेचा दिवाच पाजळावयाचा आहेना? चल ढकल घशांत. "शुभं करोतु कल्याणम्! आरोग्य धन संपदा! शत्रुबुद्धि विनाशाय! सुरापानं ढसाढसा" || अझून हातातच?
बेहडा : फार जलाल प्रकरण दिसते रे हे?
हिरडा: हां, चर्चा चिकित्सा न कुर्यात्, एकदम् गटायस्वाहा.
[बेहडा पितो. त्याला ठसका लागतो. हिरडा फुटाणे देतो. ]
बेहडा : अगदी चरचरत गेली रे! पण आहे मोठी छान न् रुचकर.
हिरडा : ही काही दरबारी छापाची बाजारी नाही. खास गुपचुप घरगुती आहे. हिच्या घोटासाठी मोठमोठे दरबारी महाजन सुद्धा अडल्या नारायणाप्रमाणे, हव्या त्या गाढवाचे पाय धरतात. बाजारी मालापेक्षा घरगुती माल केव्हाही चांगलाच.
बेहडा : आहा! और आहे बुवा ही वल्ली. माझ्या डोक्यात दिवाळीचा भपका उडाला आहे. कर्ण महाराजानी अर्जुनाची प्रतिज्ञा केली. अर्जुनानं कर्णवधाची केली. कौरवानी पाण्डववधाची केली. सगळीकडं वधांचा सुळसुळाट उडाल्यामुळे, कलियुग सुरू झालं कीं काय, या भीतीनं सुन्न झालेलं माझं डोकं खाडकन् ठिकाणावर आलं. आणखी एक पात्र दे. (पितो.) पण काय रे, कलियुग खरंच सुरू झालं नाही ना?
हिरडा : कलियुग सुरू व्हायला अजून पुष्कळ काळ गेला पाहिजे. सिन्धु, गंगा, यमुना, कृष्णा असले मोठमोठाले नद नद्या, पाण्याऐवजी या दारूनं दुथडी भरून वाहतील, तेव्हा कुठं म्हणे कलियुगाची झुंजूमुंजू होईल.
बेहडा : मग मी नाही भीत. या दारूचा पुरवठा तरी गांजासारखा भरपूर राहील ना? का ही पण त्या आवळकटीसारखी द्यायची हातावर तुरी?
हिरडा : सध्या दारूचं माहेरघर म्हणजे यादवांची द्वारका. सगळे यादव लढाईला आल्यामुळं, द्वारकेला पाण्याच्या मोलानं दारू मोकाट मिळते.
बेहडा : मग चल आपण द्वारकेला जाऊ. या कौरव पाण्डवाना मरू दे या कुरुक्षेत्रावर मघाशी, नकुलाचा न् वृषसेनाचा अस्सा सामना झाला-अस्सा सामना झाला--
[आंत - "वृषसेन पडला-वृषसेन पडला" अशा आरोळ्या.]
बेहडा : वृषसेन पडला? खरा मर्द.
हिरडा: अँ? यात कसली आली आहे मर्दाई? दारू ढोसून पडेल, तो खरा मर्द, लढाईत पडला. तो मेला. ठार झाला. जीव गेला तरी पुन्हा उठायचा नाही. पण या जगदंबेचा भगत, कितीही वेळा पडला, तरी तो उठायचाच-उठलाच पाहिजे. वेदांत म्हटलं आहे-पित्वा पित्वा पुनः पित्वा-कुठपर्यंत? यावत् पतति भूतले. उत्थायच पुनः पित्वा, नर नारायण होतसे.
बेहडा : लढाईत मरणाला मोक्ष नसतोच कारे?
हिरडा : कर्माचा आलाय मोक्ष! जीव नकोसा झालेले मूर्खच लढायला जातात. वृषसेन पडल्यावर कर्ण महाराजाना जगून काय फायदा? त्याना लढाईत पडलंच पाहिजे. आता ही महायुद्धाची रेटारेटी हिमालयाच्या पायथ्यापर्यंत जाऊन भिडणार.
बेहडा : हिमालय? हे शहर कोणत्या खेड्यात आहे?
हिरडा : चल मूर्खा, असे दारू ढोसल्यासारखं काय बरळतोस? हिमालय म्हणजे थण्डगार बर्फाचा एक मोठा डोंगर आहे.
बेहडा : तिकडं आपल्याला जावं लागणार की काय?
हिरडा : गाड्याबरोबर नळा नि आचाऱ्याबरोबर पळा. तिकडं थण्डी म्हणतात इतकी कडक आहे की, कडोसरीचा रुपया एका रात्रीत आखडून त्याची वालाएवढी चवली होते आणि साठ वर्षांचा म्हातारा थण्डीने आखडून आठ वर्षाचा पोरगा होतो.
बेहडा : पुरुषांच्या बायका नाही ना होत? नाहीतर तिकडच्या दौऱ्यावरून परतल्यावर, घरच्या संसाराचा पातळ झुणका!
हिरडा : अरे ही जलाल जडीबुट्टी जवळ असल्यावर कोण लेक थण्डीची पर्वा करतो. [आंत नौबदी, शिंगे वाजतात]
हिरडा: ही पहा नौबत झडली, दौन्याची तयारी झाली. चल ऊठ. (त्याला उभा करतो)
बेहडा : (झिंगत उठतो) हिरड्या, मी महायुद्ध आहे, बर्फाचा डोंगर आहे, मी दौरा आहे, नौबत आहे. शंख आहे. -काय रे माझे पाय लटपटतात-का डोकं हवेत गिरक्या खातंय? घालीन पृथ्वी पालथी, स्वर्गा आणीन वरती-
हिरडा : अरे, आता स्वर्गाचे पृथ्वीशी लगीन लागणार आहे लगीन. पाय संभाळ, आस्ते कदम. निगा रखो मेहेरबान.
बेहडा : स्वर्ग पृथ्वीच्या लग्नातला मी वरघोडा आहे, वरघोडा.
हिरडा : (कान पकडून) या घोड्याची लगाम अश्शी पकडून, तबेल्यात ठाणबंद केला पाहिजे. (ढकलून देतो) दारू खुशाल प्यावी-म्हणून काय इतकी?
(जातात.)
प्रवेश २ रा
[समरांगणाची एक बाजू]
[आंत "वृषसेन पडला" आरोळ्या कर्ण व राज्य प्र. क.]
कर्ण: कसला हा गलबला? कोण पडला?
शल्य : कर्णा घात झाला. आपला वृषसेन पडला.
कर्ण : वृषसेन पडला? माझा युवराज पडला? शाबास शाबास, लाडक्या जिवा, आपल्या सुतकुलाचा उद्धार केलास.
शल्य : कर्णा, यापुढे युद्ध चालवण्यात अर्थ नाही. तुझा निर्देश झाला. महाराणी वसुन्धरेला काय वाटेल? त्या युद्ध राधा मावलीला काय वाटेल?
कर्ण : त्यांना काय वाटायचे? वृषसेन पडला. अर्धा दिवस पाण्डवातल्या मोठमोठ्या मोहऱ्यांना जेरीला आणून, धारातीर्थात माझ्या आधी मोक्षाला गेला. माझ्या वसुंधरेचा कुसवा धन्य झाला. लेकानी बापावर मात केली. माझ्या वीरश्रीला न् कौरवभक्तीला वृषसेनानं चैतन्याची चांगलीच चपराक हाणली.
शल्य : पुत्राच्या मृत्युनं तुला काहीच दुःख होत नाही कर्णा?
कर्ण : अरे, माझा वृषसेन काय दुखण्यानं खितपत पडून बिछान्यात मेला, का आकण्ठ जेवणाच्या आधाशी भिक्षुकासारखा उसका लागून भरल्या ताटावरून ताटीवर गेला? कुरुक्षेत्राच्या समरांगणावर, तब्बल पंधरा घटका, घर्मण्डखोर पाण्डवांची तिरन्दाजी बोथट पाडून मर्दासारखा समरांगणावर पतन पावला. पुत्रवधाची नुसती बातमी ऐकताच देहभानाला नि कर्तव्याला तिलांजली देणारा द्रोणाचार्य मी नव्हे.
शल्य : कर्णा, बाहेरून तू कितीहि विवेक दाखवलास, तरी पुत्रशोकाचं जलाल विष खात्रीनं तुझ्या अन्तर्यामीचं पाणी पाणी करीत असणारच. अशा व्याकुळ मनानं अर्जुनाच्या सामन्याचा चंग बांधण्यापेक्षा---
कर्ण : शल्या, हा तुझा प्रश्न नव्हे. तू माझा सारथी आहेस. तेवढं काम उत्तम कसोशीनं बजाव, म्हणजे झालं. इतर बाराबत्तल गोष्टींची चर्चा करू नकोस.
शल्य : कर्णा, तुझा आत्मविश्वास मला फाजील दिसतो. गर्वाचं घर खाली, ही म्हण विसरू नकोस.
कर्ण : पुढारलेल्या घमेण्डखोरानीच मागासलेल्या गोरगरिबांसाठी, असल्या म्हणी चलनी केल्या आहेत. सुखदुःखाची नि यशापयशाची वान्झोटी बडबड निष्क्रीय दैववाद्यांनी करावी. स्वतःच्या पोटचा गोळा, समरांगणावर, मर्दाच्या मरणानं मोक्षाला गेलेला पाहून, वीर पित्याला न् वीर मातेला केवढा ब्रह्मानंद होत असतो, याची कल्पना, यशापयशाची चिन्ता करणाऱ्या भ्याडांना असणार कुठून! चामडी बचावून कसे तरी जगण्यापलीकडे ज्याना विशेष काही कर्तव्य नाही, नव्हे, काही करण्याची अक्कलच नाही-असल्या शेन्दाड षण्ढांनी महत्त्वाकांक्षी मर्दाच्या अपयशांत नि मरणात सुद्धा समाधानाचा काय मोक्ष असतो, याचा ठाव घेण्याची खटपट करू नये.
शल्य : कर्णा. कृष्णार्जुनाशी समोरासमोर सामना भिडला नाही, तोवर या जम्बुकी वल्गनाना किंमत.
कर्ण : कृष्णार्जुनाचा दरारा तुझ्यासारख्या दुटप्पी दुसोण्डवांना. मला नाही.
शल्य : अपयशाची बोहणी झालीच आहे. आता लवकरच अधःपाताचा दणका बसला
कीं ब्रह्मांड आठवेल.
कर्ण : कौरवांच्या सेनापतीचा सारथीच ही बडबड करीत आहे का? तुझ्या जागी जर दुसरा कोणी असता तर शल्या, त्याचा शिरच्छेद करूनच मी कृष्णार्जुनाशी भिडलो असतो समजलास? अरे अधःपाताचा दणका सहज लीलेनं झेलायला छातीसुद्धा तशीच कणखर लागते. शल्या, मला माहीत आहे, आज सकाळपासन हवी तशी उणीदुणी भाषणं बोलून, माझा तेजोभंग करण्याचा सारखा अट्टहास तू करीत आहेस. पण लक्षात ठेव, श्रीकृष्ण यादवाच्या या पाताळयन्त्री कारवायीला बळी पडणारा पिठाचा पुतळा हा कर्ण नव्हे. अरे, तेजोभंग आम्हा सूतादि शूद्रजनांच्या पाचवीलाच पुजलेला! त्याच्या टचक्यानं पिचणारी आमची हृदये, म्हणजे छेलछबेलीच्या हातातल्या बांगडया समजतोस की काय? तू आपलं सारथ्यकर्म कौरवांच्या मिठाला जागून चोख करून दाखव. कर्णाच्या किंवा महायुद्धाच्या भवितव्याचा वान्झोटा उपद्व्याप सोडून दे. प्रतिपक्षाच्या न् निन्दकांच्या बऱ्यावाईट अभिप्रायावर महत्त्वाकांक्षी मर्द आपल्या कर्तव्यनिष्ठेची पावलं मागंपुढं चाळवते, तर शल्या, आजला ही दुनिया माणसांऐवजी कृमिकीटकांच्या सुळसुळाटाची मसणवटी बनली असती.
[आत नौबदी, शंख, शिंगे वाजतात. सैन्याचा गलबला, कृष्ण. "तो पहा- अर्जुना, तो पहा, कर्ण तिकडं आहे. कर्णा चल हो तयार अर्जुनाशी सामना द्यायला."]
कर्ण : हां हां कृष्णा, हा कर्ण तुमचीच वाट पहात आहे. येऊ दे तुझ्या अर्जुनाचा पहिल्या प्रणिपाताचा बाण-
वांकिव धनुला चढवि बाण आकर्ण ओढि प्रत्यंचा ।
प्रहार पहिला मज आवडतो अतिशय मर्द रिपूचा ॥
कारण माझा काळवाण सुटतांच रिपूचें स्थान ।
क्षणांत होईल भस्म तयाचें कसलें मग अवसान ॥
[आतून बाण येतो]
-शाबास- आता पहा या कर्णाचा पराक्रम. शल्या, चल. भिडव आपला रथ कृष्णार्जुनाच्या रथाशी.
शल्य : आज्ञा प्रमाण.
[दोघे जातात.]
प्रवेश ३ रा
[समरांगणाची दुसरी बाजू]
[श्रीकृष्ण आणि अर्जुन प्र.क.]
कृष्ण : अर्जुना, पाहिलास ना कर्णाचा पराक्रम?
अर्जुन : कृष्णा, सारथ्यकर्माची आज तू कमाल केलीस. कर्णाच्या बाणाचा वेध न् वेग ओळखून चटकन आपला रथ जमिनीत तू दाबला नसतास, तर माझ्या किरिटाऐवजी हे शिरकमलच त्यानं उडवलं असतं.
कृष्ण : आणि तुझ्या वधानंच या महायुद्धाचा शेवट आत्ताच लागला असता. पण जोवर मी आहे तोंवर तुम्हा पाण्डवांना कशाचीही भीति नाही. अर्जुना, युद्धनीतीची सूत्र हालवताना माझ्या वर्तनांत पुष्कळांना धरसोडपणा किंबहूना धडपडीत खोटेपणा सुद्धा दिसून येईल. पण जगण्या मरण्याचा निर्णय ठरवणान्या युद्धात, `सत्यंवद` `धर्मांतर` असल्या लौकिकी नीतीचा उपयोग करून भागत नाही. शठंप्रति शाठ्यम् सेच काय, पण सत्यमप्रति शाठ्यम्चाही टणत्कार करून विजय मिळवावा लागतो. कौरवांशी सरळ धर्मयुद्धाचा सामना देण्यात पाण्डवांचा टिकाव मुळीच लागला नसता, अन् यापुढं तो लागणारहि नाही. शत्रू अडचणीत सापडलेला पाहूनच त्याला गारद करण्यांत-
अर्जुन : पुरुषार्थ कसला?
कृष्ण : पुरुषार्थ नसला, तरी कार्यार्थ साधत असतो ना? कार्यसिद्धि झाल्यावर साधनांच्या बरेवाईटपणाची चौकशी कोण कशाला करतो?-(दूर पाहून) अर्जुना-अर्जुना, कर चपळाई. ते पहा, कर्णाच्या रथाचं चाक जमिनींत रुतलं, पृथ्वीन गिळलं, तो पहा शल्य न् कर्ण रथावरून खाली उतरून, चाक बाहेर काढण्यासाठी खेचाखेची करीत आहेत. हां! पाहातोस काय तोण्डाकड? सोड बाण न् कर कर्णाला ठार. उशीर लाऊ नकोस. चल आटप.
अर्जुन : काय? कर्ण गैरसावध असता, त्याच्यावर मी शरवृष्टि करू? असलं कृत्य पाहून देव-दानव मानव माझी आचन्द्रार्क निन्दाच करतील.
कृष्ण : आलं का मोहाचं ढगार पुन्हा तुझ्या मनावर? फुकट फुकट तुला इतका गीतोपदेश केला नि आत्तापर्यन्त सावरून धरला. मुर्खा, कर्ण तुझा शत्रु. त्याला ठार मारणं, एवढाच तुझा धर्म. अशा प्रसंगी निन्दास्तुतीच्या बुजगावण्याना भिऊन, कर्तव्यच्युत होतोस? ते काही नाही. कर्णाला याच अवस्थेत तुला ठार मारलं पाहिजे. हा मौका गमावलास नि कर्ण रथारूढ झाला, तर अर्जुना, लक्षात ठेव, त्याच्या कोदण्डाचा टणत्कार इन्द्राच्या वज्राचेही खडपे खडपे उडविल्याशिवाय रहाणार नाही. चल, चढव धनुष्यावर बाण न् मी सांगतो म्हणून ठोक त्यावर दिव्यास्त्र.
अर्जुन : कर्णा, सांभाळ. हा पहा आला माझा बाण.
[आत कर्ण- पार्था, पृथ्वीनं गिळलेल माझ्या रथाचं चाक बाहेर कढण्यात मी गुंतलो आहे. तेव्हा क्षणभर थांब. मला रथावर आरूढ होऊ दे, मग खुशाल चालू दे तुझी अस्त्रवृष्टि, पण अडचणीत सापडलेल्या निःशस्त्र शत्रुवर बाण सोडणं, हा क्षत्रिय बाण्याच्या तोण्डाला काळे फासणारा अधर्म आहे. तो तू करू नकोस. ]
["हा अधर्म होत आहे" असा आत ओरडा]
कृष्ण : राधेया, आता तुला धर्माची आठवण झाली काय? नीच पुरुषांना व्यसनातिरेकाच्या प्रसंगीच धर्माची आठवण होत असते.
[अस्तन्या वर सारलेला कर्णे प्र. क.]
कर्ण : नीच पुरुष? कोण नीच पुरुष? रथाचं चाक बाहेर काढण्यात आम्ही दोघे गर्क असता, आमच्यावर शरसंधान रोखण्याचा सल्ला देणारा नीच, का क्षत्रियोचित धर्मयुद्धाची मागणी करणारा नीच?
कृष्ण : युद्धधर्मात लौकिकी धर्माला जागा नसते.
कर्ण: ही कृष्णनीति असेल, पण ती तुझ्या रंगा नावांसारखीच काळीकुट्ट म्हणून विचारी सज्जनांच्या निन्देलाच पात्र होणार. अर्जुनासारख्या धनुर्धरानं धनुर्धराशी सामना द्यावा. मला माझा रुतलेला रथ चालता करू दे. माझं धनुष्य मला हाती घेऊं दे. मग पाहून घेऊ आम्ही एकमेकाला. पण मी नि माझा सारथी रथच्युत असता, आमच्यावर शरसंधानाची चिथावणी देतोस? हा कोणता नीतीचा धर्म? शरम वाटली पाहिजे कृष्णा तुला.
कृष्ण : धर्मावरच येऊन भिडलास, म्हणून विचारतो. कर्णा, अक्षविद्येत अनभिज्ञ अशा धर्मराजाला शकुनीनं द्यूताचं पाचारण केलं आणि त्याला फसवलं, त्यावेळी तुमचा धर्म कुठे गेला होता?
कर्ण: तुमच्या धर्माची अक्कल कुठे गेली होती? अक्षविद्येत आपण ढ आहोत, हे जाणून बुजून पाचारणाचा स्वीकार केला कशाला धर्मानं? पोहता येत नाही त्यानं पाण्यात पाऊल टाकावंच कशाला?
कृष्ण : बारा वर्षे वनवास नि एक वर्ष अज्ञातवास भोगल्यावर सुद्धा, पाण्डवाना त्यांचं राज्य न देण्याचा तुम्हा कौरवांचा हट्ट, हा देखील धर्मच होता नव्हे का?
कर्ण : राजसंन्यास करून वनवास पत्करणाऱ्या पण्डूच्या नियोगाच्या संततीला कसला आला राज्याचा वारसा? भारत सम्राटाची राजगादी म्हणजे काय ओसाड गावची धर्मशाळा समजता? हवे त्याने यावे न् बिऱ्हाड थाटावे? वनवासाच्या, संन्यासाच्या न् उपासतापाच्या पुण्याईनं राज्यप्राप्तीचे मुकाबले फडशा पडते, तर कृष्णा, हिमालय पर्वतावर भटकणारे सगळे जोगडे आज भारतसम्राट म्हणून मिरवते.
कृष्ण : सूतपुत्रा, वारणावतामधे पाण्डवाना लाक्षगृहात जिवन्त जाळण्यासाठी, कर्णा, तूच नाही का काकडा पेटवलास? त्यावेळी तुझा धर्म कुठं गेला होता?
कर्ण : अरे, एकदा शत्रु ठरल्यावर त्याचा हवातसा विध्वंस करावा, हा तुझ्याच गीतेच्या कृष्णनीतीचा पुरावा! एकाच तोण्डाने नीति अनीतीचे सर्दगरम सुस्कारे सोडताना, कृष्णा, तुला तरी खऱ्याखोट्याची चाड राहिली आहे कारे? तर मला मोठ्या धर्माच्या गोष्टी शिकवतोस?
कृष्ण : रजस्वला. द्रोपदीला दुःशासनानं भरदरबारात फरफटत ओढीत आणली, त्यावेळी तू मोठ्यानं खदखदा हसलास. त्यावेळी तुझा धर्म कुठं गेला होता.
कर्ण : घटकेत तुझे तेरा रंग! कृष्णा, काल रात्रीची शिष्टाई विसरलास वाटतं इतक्यात? मी कुणाचा कोण, हे तुला माहित आहे. अस असताना सुद्धा. त्या दगलबाज द्रौपदीनं, अखिल भारतीय क्षत्रियांसमोर, स्वयंवर प्रसंगी "सूतपुत्र-सूताधम" अशा कचकचीत शिव्या देऊन माझा तेजोभंग केला, तेव्हा तुम्ही सगळ्यांनी बत्तिशी वासून हासण्याचा खोकाट केलात, तो अगदी गाळीव धर्माच्या साच्यातलाच होता, नाही का?
कृष्ण : सगळे पाण्डव आता भिकारी झाले. कायमचे नरकात पडले, तेव्हा द्रौपदी, तू आता दुसरा नवरा कर, असा टोमणा देताना, कर्णा, तुझा धर्म कुठं गेला होतारे?
कर्ण: त्या पाच नवऱ्याच्या पतिव्रतेनं आणखी एका जादा नवऱ्याचं पाणिग्रहण केलं. तर त्यात काय धर्माला एवढी ग्लानी येती? द्रौपदीनं या कर्णालाहि नेत्रकटाक्षाची मोहनी घालायला सोडलं नव्हतं, हे कृष्णा तुला चांगलं माहित आहे. शिवाय एक हौशी उमेदवार म्हणून धनुर्विद्येची परीक्षा द्यायला, मी प्रथम रंगभूमीवर पाऊल ठेवलं, त्यावेळी ` तुझा बाप कोण? तुझा बाप कोण? ` म्हणून कलकलाट करणाऱ्या या तुझ्या पाण्डवांना लाज वाजवून नादी लागणाऱ्या कान्होबानं तरी स्त्रीदाक्षिण्याच्या वल्गना करू नये.
कृष्ण : माझ्या स्त्रीदाक्षिणाचं रहस्य उमगायला फार युगे लोटली पाहिजेत.
कर्ण : प्रत्येक भोन्दू नि लफंगा याच विधानावर आपल्या बुवाबाजीचा बाजार थाटीत असतो.
कृष्ण : परवा चक्रव्यूहामध्ये तुम्ही सर्व महारथ्यानी अभिमन्यूला एकटा गाठून ठार मारला. हा तुमचा धर्म झाला काय?
कर्ण : तो तरुण मर्द निधड्या छातीने चक्रव्यूह फोडीत धडाडीनं पुढं जात असता, त्याच्या पाठीशी सैन्याची कुमक न पाठवता, तुझे सगळे पाण्डव व्यूहाच्या बाहेर मजा पहात स्वस्थ बसले, हा काय त्यांचा धर्म, युद्धकौशल्य का शहाणपणा?
कृष्ण : पण तुम्ही तर त्याला एकटा गाठून ठार मारलात ना!
कर्ण: ते आमचं कर्तव्यच होतं. पण त्यासाठी इतकी हातबोटं चोळायला काय झालं? माझ्या वृषसेनाला आत्ताच अगदी थेट तस्साच-नाहीत का तुम्ही मारलात.
कृष्ण : दाताला दात नि डोळ्याला डोळा, असा सूड आम्ही घेणारच.
कर्ण : केवळ सूडाची भावना बाळगणारानी तरी धर्माधर्माच्या बाष्फळ बाता मारू नये. त्या सिंहाच्या छाव्यानं तब्बल पन्धरा घटका तुम्हाला दे माय धरणी ठाय केलं, आणि अखेर त्याचा वध करायला पाचहि पाण्डवाना आपली युद्धशक्ति एकवट खर्ची घालावी लागली ना! मग मी नाही कुठे तुमच्यासारखी बायकी तक्रार केली ती, का माझ्या युवराजाला तुम्ही एकटा गाठून ठार मारलात म्हणून? हे युद्ध आहे. महायुद्ध आहे. ते जिंकण्याची प्रत्येक पक्ष शिकस्त करीत आहे. त्यात अमक्याला असं मारलं न् तमक्याला तसं मारलं, या लौकिकी रडगाण्याचे सूर दगलबाज घोडेहाक्याच्या तोण्डातच छान शोभतात.
[आत-शल्य : कर्णा, चल लवकर परत ये हे पहा मी तुझ्या रथाचं चाक बाहेर काढलं.]
कर्ण : शाबास शल्या शाबास! हा पहा आलोच मी. कृष्णा, तुला निक्षून सांगतो, तुझ्या कपटनीतीच्या भांडवलावर पाण्डवानी जयश्री मिळवली, तरी अखेरीला हे कृष्णनीतीचं भाण्डवल त्यांच्या सार्वभौम सत्तेला कीड लावल्याशिवाय राहाणार नाही, हे लक्ष्यात ठेव.
कृष्ण : भविष्याची वाटाघाट आत्ताच कशाला? ते आमचं आम्ही पाहून घेऊ.
कर्ण : ठीक आहे. भविष्य तर पहालच, वर्तमान आत्ताच दाखवतो. शल्या, चल आण या बाजूला माझा रथ. कृष्णा, आत्ता मी रथारूढ होतो नि धनुष्य हाती घेतो. मग येऊ दे तुझ्या अर्जुनाची शस्त्रास्त्रदृष्टी. पाहून घेईन.
[जातो. ]
कृष्ण : अर्जुना, पाहातोस काय? स्थारूढ होऊन, कर्ण धनुष्याला भिडला नाही. तोच सोड तुझे राखीव दिव्यास्त्र, शाबास! [अर्जुन दिव्यास्त्र सोडतो मोठा आवाज होतं. " कर्ण पडला " असा आत ओरडा होतो. बावरलेली कुन्ति येते.]
कुन्ति : कर्ण पडला? कर्ण पडला? कृष्णा, कर्ण असा इतक्यात कसा रे पडला!
कृष्ण : आत्याबाई, लढाईच्या रणधुमाळीत तुम्ही कशाला आलात?
कुन्ति : अरे पण तो रथावर सुद्धा चढला नव्हता?
[चवताळलेला शल्य प्र० क०]
शल्य: कुन्ति, धिक् तुझ्या पाण्डवाच्या क्षात्रधर्माला! कर्ण रथच्युत आणि निःशस्त्र असतानाच, अर्जुनाने अस्त्र सोडून त्याचा वध करावा? कौरवार्थ सेनापति दगाबाजीच्या कपटनीतीनंच ठार मारून मिळणारा विजय तुमचा तुम्हालाच लखलाभ असो. धि:क्कार, कृष्णा, धि:क्कार तुझ्या युद्धनीतीला!
कुन्ति : कर्ण निःशस्त्र असता त्याचा वध झाला? कृष्णा, तू जवळ असता अशी नामुष्कीची गोष्ट कशी रे झाली?
कृष्ण : आत्याबाई, हे युद्धशास्त्रातले डावपेच तुम्हा बायकांना नाही उमगायचे.
कुन्ति : पण या डावपेचानी कृष्णा अखेर पाण्डवाच्या बन्धुधर्माला नि क्षात्रधर्माला काळोखी आणली नि मरेपर्यन्त या अभागी कुन्तिच्या आतड्यांत पुत्रशोकाची घुसळण घातली!
अर्जुन : पुत्रशोकाची घुसळण? आई म्हणतेस काय तू?
कृष्ण : अर्जुना, कर्ण हा तुम्हा पाण्डवांचा श्रेष्ठ बन्धू, पहिला पाण्डव. युधिष्ठिराच्या जन्मापुर्वीच या कुन्तिचा कुसवा धन्य करणारं टाकलेल पोर.
अर्जुन : अरे पण कृष्णा, हे आधी का नाही आम्हाला तू सांगितलंस?
शल्य : त्याला दाणे टाकून कोंबड्या झुंजवायच्या होत्या ना?
कृष्ण : कोंबड्या झुंजवायच्या नव्हत्या, समाजाच्या विकल्पाना तोंड द्यायचं होतं अन् पुरस्कार केलेल्या पाण्डवांच्या महत्त्वाकांक्षा सिद्धीला न्यायच्या होत्या.
अर्जुन : अरे, पण हे रहस्य आम्हाला आधीच कळतं. तर वडील बन्धूचा असला अधर्मवध करायचं पातक, कृष्णा, तुझ्या आग्रहानं सुद्धा भी खास खास केलं नसतं.
कुन्ति : शल्य दादा, माझ्या बाळाचं शेवटचं दर्शन तरी मला अभागणीला घडेल का रे?
शल्य : कुन्ति ताई, आत्म्याची दिव्यज्योत विझालेल्या त्या धनुर्धराच्या शवाचं नुसतं दर्शन घेण्यात काय अर्थ! कुन्ति, तुझ टाकलेलं पोर पाण्डवांच्या कपटनीतीला बळी पडलं! तुझा युवराज गेला.
कुन्ति : माझा बाळ गेला? गेला? मला न विचारता गेला? कसा जाईल? नाही जाणार !नाही जाणार! त्याच्या उदार हृदयाची अथांग श्रीमन्ती शल्यदादा, नाही या अभागी मातेशी अशी प्रतारणा करणार! जा-पहा पहा-माझ्या भेटीसाठी माझ्या बाळाचा प्राण खास घुटमळत असला पाहिजे. दादा, दादा, जा हो कुणितरी माझ्या कर्णाला इकडे घेऊन या. का मीच जाऊ प्रेतांच्या राशी तुडवीत त्याच्याकडे? मीच जाते.
शल्य : ताई थांब, मीच त्याला इकडं आणवतो. [जातो]
कुन्ति : जा जा लवकर जा. या अभागणीनं जन्म देऊन, माझ्या बाळाला दुधाचा एक थेंबसुद्धा हो नाही कधी पाजला. माझे दोन अश्रुबिन्दु तरी अखेर त्याच्या तोण्डात पडू द्याहो! अर्जुना-कृष्णा, कसलारे प्रसंग आणलात या कुन्तिवर!
कृष्ण : आत्याबाई स्पष्ट बोलतो त्याचा राग नका मानू. लौकिकाला न् समाजाच्या विकल्पाला वचकून, पोटचं पोर टाकण्याचा अत्याचार, अखेर केवढा भयंकर परिणाम करतो, हे स्त्रीजातीच्या मातृहृदयी मनावर बिम्बवण्यासाठी तुझा अवतार, आणि मागासलेल्या समाजांचा उद्धार करणाऱ्या स्वयंप्रकाशी वीराला किती विरोधांना तोड देऊन पुढे यावं लागतं, याचा दाखला जगाला पटवण्यासाठी या वीरमणी धनुर्धर कर्णाचा अवतार! आत्याबाई कर्णाच्या सर्वांगसुन्दर चारित्र्याचा मला मुळीच आदर वाटत नाही. अशी का तुमची समजूत आहे?-मोठा अभिमान वाटतो. महाभारतीय युद्धाचा इतिहास जरी कायमचा नष्ट झाला, तरी उदारधी धनुर्धर कर्णाचं चरित्र मागासलेल्या न् पददलित अखिल मानवजातींच्या उद्धारासाठी आपल्या देदिप्यमान तेजानं शुक्लेन्दुयत् प्रज्वलितच राहील
["धनुर्धर अंगराज कर्णाचा जयजयकार" अशा गर्जनात मूच्छित कर्णाला सेवक घेऊन येतात, शल्य येतो. कुन्ति त्याचे मस्तक माण्डीवर घेते]
कुन्ति : बाळा कर्णा-बोल माझ्याशी एक शब्द तरी बोल रे. ते पहा तुझे ओठ हालताहेत. `आई` अशी शेवटची एक तरी हाक मार रे.
कर्णे : आई! अधर्मयुद्धानं माझा वध होत आहे. हे तुझ टाकलेलं पोर तुझ्या अंकावर मरत आहे. एवढंच समाधान। ॐ शांतिः शांतिः शांतिः
कृष्ण : धारातीर्थी पतन पावलेल्या धनुर्धर कर्णाला श्रीकृष्णाचा पहिला प्रणिपात.
सर्व : अंगराज कर्ण महाराजांचा जयजयकार (त्रिवार)
ॐ शुभम् भवतु
नाटकाची पद्य-पुरवणी
[प्रयोगात अधून मधून पदे असावी, असे ज्यांना सोयीस्कर वाटत असेल, त्यांच्यासाठी
ही व्यवस्था केलेली आहे.]
(पडद्यांत गावयाच्या नांन्दी)
(भूप- झपताल.)
हरित हरि दुरित-नग करूनि जय मंगला |
पांडवारी खलुनि देइ यश वांछिता ॥धृ.॥
देवता अंबिका पार्थ-शर चेतना |
सारथी हरि रणीं म्हणुनि रिपु मंगला ||१||
[ठाकरे]
[हिरडा गात प्रवेश करतो. अंक १, प्रवेश २, पान १३१]
(लावणीमिश्र कटाव.)
हिरडा :-
फुका मरति संगरी धडाधड बुळे बावळे खुळे ।
हे मर्द कशाचे? तत्वमसि न त्या कळे ॥
सखिविण क्षणभर । राहि नच प्रियकर ।
संताप विरह दे सदा । नामर्दं संगरी फिदा ||१|||
माझ्या जिवा प्रेमाचा चटका । मी मर्द नव्हे मुळिं लटका
नजरेचा लागला झटका ॥ गहिरी नजर, करि जवान
जर्जर, क्षणांत रससंगरी । घेणार उडी बेफाम पृथ्वी
सम्राट सखी जिंकुनि ॥२॥
[ठाकरे]
-----------------------
[पान १३७, हिरडा बेहडा जाताना त्रिवर्गांनी म्हणावयाचें पद)
आवळकटी :-
खरतर शल्यें । टोंचुनी शरिरीं । निज मनि देइल मोदा
हिरडा : मधुरशा सुखवशा बाला ||
आवळ० :
भुलवुनि अति रमणा । रुचत मना । फसवुनि प्रणया ।
सुखद मला गमते । जगीं तें ॥
हिरडा० :
कुणा न रमवी । जगांत रमणी । जोडवी जन सगळे । साचे ॥
आवळ० : छंद सारा
हिरडा० : जीव घाला
आवळ० : जात विलया
हिरडा : शीण सगळा हा
हि० आ :-
चला चला । तयार व्हा । विवाह ये सुखवाया । आतां ॥ १ ॥
[ कवि कै. मानकर]
----------------
[पान १४७, ओळ ५, हिरडा— `काय त्याची तारीफ करावी?` यानंतर--]
हिरडा :--
अरसिक हे गायनास । विटत सतत । विकल होत गाना ।
सुखवित परि । रसिक सकल । मधुर गोड ताना ॥ धृ० ॥
पुनित करित भावनांस । विरुनि जात वासना । वितरत
मधु स्वर सुखदा ॥१॥
[राग बिहागडा]
[मानकर]
----------------------
[पान १५५, ओळ १२ `कबूल, कबूल, कबूल` नंतर हिरड्याचे पद.]
हिरवा :--
तव पण हा । जिंकुनिया । बघ सखी । तव कर घेईन हा ॥
आवळ० : प्रणाम तव शिर करि पदीं या ॥
हिरडा : प्रणय फुलां । गुंफुनिया । तुला वाही सजणे सदा ॥ १ ॥
[--मानकर.]
---------------------
[पान १६७, ओळ २]
कुन्ती :--
`म्हणून कां माझा राजहंस माझ्यावर रागावला आहे`
यानंतर--
कुणा कळावा | कुणा दिसावा । मम हृदयीचा बाळ विसावा ॥ १ ॥
अनुढा माता । ठरते पतिता । समाजबंधनी । तिज ना त्राता ।
मातृस्तनीं या फुटला पान्हा । कुठले कौतुक । त्यजिला तान्हा ॥ २ ॥
[--मानकर.]
----------------
[पान १७४, हिरडा— `पागलपणाकडं पाहून हासत आहेत` नंतर--]
हास जरा वा नाच जरा । शीळ जरा लल्कार ।
हलका कर हासून पुरा । जगण्याचा जडभार ॥
हसणारा हसविल दुनिया । रडणारा रडवील
दुक्खावरतीं पसरिल छाया । हसणारे सत्शील ॥
श्रम थोडे वेतन थोडें । बाकीच्या संतोष ।
रम्यतेंत कर मन वेडे । त्यांतच हो बेहोष ॥
असतां असतां हासच अथवा । हसता हसता डोल ।
आनंदाचा असला ठेवा । हें जगण्याचे मोल ॥
[कवि `आनंद` चिपळूण]
---------------------
[ पान १७६, ओळ १७. हिरडा— `खरी खुमारी असते`नंतर--]
हिरडा :--
जगीं मोहवाया । सुरा दे विधाता । सुखा या सुधारा ॥ धृ० ॥
सुरासुरां प्रिय ही मदिरा । मधुरस खुलवित । झुलवित मम मन ॥ १॥
[--मानकर]
---------------
अथवा हे पद. [चाल-- जो पिया आया०]
मधुर वारुणी । स्वर्ग-सौख्यास दइं नरा प्राशनीं।
तरुण जाया युवा जैं प्रिया ही जनीं ॥ धृ० ॥
निधी-मंथनीचे अमृत त्या शक्ति नसे ॥
सुरा मुक्ति तरां देइ करा श्री भासे ।
तरुणि-नयना हिची उपमा । कवि-कल्पना देतसे जनी॥ १ ॥
[ठाकरे]