स्वाध्याय संदेश
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
।। काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम् ।।
गोविंदाग्रज ग्रंथमाला, पुष्प ५ वे
स्वाध्याय-संदेश
अथवा
श्री. केशव सीताराम ठाकरे, यांचे निवडक निबंध
संपादक
मोरेश्वर बाळकृष्ण देशमुख, बी.ए.
प्रकाशक
गोविंदाग्रज मण्डळ, दादर, मुंबई नं. १४.
किंमत १ रुपया
Printed by M. N. Kulkarni at Karnatak Press,
434 Thakurdwar, Bombay
AndPublished by M. B. Deshmukh, B. A., Honorary
Secretary, Govindagraj Mandal, Dadar, Bombay
संपादकीय बोल
वाचका, आपण हाती घेतले आहे हे गोविंदाग्रज-ग्रंथमालेचे पांचवे पुष्प! मालेत प्रथमच काव्यलतेची चार पुष्पे गुंफून मालाकाराने यथाशक्ति कविजनांचा सत्कार केलाच आहे. आजपर्यंत पद्यपुष्पांनी रसिकांची पूजा बांधिली; आता जनताचरणी हे पहिलेच गद्यकुसुम अर्पित आहे. कल्पनामय काव्याचा पद्यप्रदेश सोडून आज काव्यमय कल्पनांच्या गद्यप्रदेशांत प्रवेश करिताना, रसिका, आपल्याला नवख्या अनोळखीपणाने गांगरून जाण्याचे मुळीच कारण नाही. ``स्वाध्याय-संदेश’’ हे सुंदर कल्पनांनी खच्चून भरलेले एक गद्य-काव्यच आहे! पद्यजनक काय, किंवा सुंदर गद्याचा कर्ता काय, कल्पनेच्या करामतीवर `कवि’ या संज्ञेला दोघांचाही सारखाच हक्क पोहोचतो. फरक एवढाच की कलेच्या मंदिरांत कवितेला कायमचे माहेर मिळाल्यामुळे, फक्त सौंदर्योत्पादनाशिवाय इतर कोणताही कायदा कवि बेगुमानपणे मोडू शकतो, व म्हणून त्याचा मार्ग सुकर असतो. गद्यलेखकाला तसे करणे शक्य नसते; म्हणून त्याचा मार्ग दुष्कर असतो. कल्पनेच्या भरारी बरोबरउंचावता उंचावता कवि स्वतःला कोठेही हरवून बसला तरी ते त्यास भषणास्पदच होते. काल्पनिक अस्मानात गद्यलेखकाने मात्र स्वतःला विसरणे नेहमी दूषणास्पद असते.
`हे सारे मनि आणुनि मग - ’स्वाध्याय संदेश हाती धरा. `स्वाध्याय-संदेश’ हे श्रीयुत ठाकरे यांच्या पंधरा वर्षांच्या लेखकी आयुष्यांतील निरनिराळ्या विचारस्थितीचे चित्र आहे! आरंभीचा आवेश, रंगाचा भडकपणा, आणि कल्पनांचा स्वैर विहार, मध्यमावस्थेतील स्थिरावलेला विचार, आणि सुसंघटित कल्पना व परिणतावस्थेतील गंभीर विचार, योजक मांडणी व पूर्ण विकसित कल्पना, आणि आरंभापासून अखेरपर्यंत नवमतवादी सत्यप्रेमी तडफ व ओजस्विता वगैरे छटा, वाचका, आपण निरखून घ्यावयाच्या आहेत. असो!
संदेशातील सुंदर संग्रह प्रसिद्ध करण्याची परवानगी दिल्याबद्दल श्रीयुत ठाकरे यांचा व अतिशय अल्पावधीत त्याकरिता विद्वत्ताप्रचुर प्रस्तावना लिहून दिल्याबद्दल प्रि. भाटे यांचा, मंडळाच्या वतीने मी अत्यंत आभारी आहे. वक्तशीर सुंदर छपाई हा श्रीयुत कुळकर्णी यांच्या कर्नाटक छापखान्याचा विशेषच आहे. मंडळाच्या तर्फे त्यांचे आभार मानणे माझे कर्तव्य आहे. श्रीयुत शंकरराव किर्लोस्कर, श्री. सुंदरराव वैद्य व श्रीयुत दत्तोपंत देशमुख या कुशल चित्रकार बंधुंनी स्वाध्याय-संदेशच्या सौदर्यात घातलेली भर केवळ आभार प्रदर्शनाने भरून येणे नाही!
सर्वांचा नम्र सेवक,
मोरेश्वर बाळकृष्ण देशमुख
स्वाध्यायाश्रम, दादर, मुंबई
२३-१-१९२३
माघ शु. शिवशक, २४९
प्रस्तावना
वाङ्मयक्षेत्रांत नेहमी वावरणा-या माणसाला वाङ्मयाची व्याख्या काय, असे विचारल्यास तो सुद्धा चटकन उत्तर देण्यास कचरेल. कारण `वाङ्मय’ हा शब्द जरी अलीकडे लोकांच्या फार तोंडी आहे, तरी वाङ्मयाच्या स्वरूपाकडे फारच थोड्यांचे लक्ष गेलेले असते. आधी या शब्दाला व्यापक व विशिष्ट असे दोन अर्थ आहेत, हे पुष्कळांच्या ध्यानात येत नाही. यामुळे या दोन अर्थांचा मनात गोंधळ होतो व वादविवाद करताना वाङ्मयाचा एकदा एक अर्थ मनापुढे असतो तर दुस-यांदा दुसराच अर्थ मनात येतो. व्यापक अर्थी वाङ्मय म्हणजे एखाद्या भाषेत जे जे काही लिहिलेले असते व म्हणून ज्याला ज्याला बोलण्यापेक्षा टिकाऊपणा आलेला असतो ते ते सर्व होय. जुने कागदपत्र, जुने जमाखर्च, जुनी टिपणे, जुन्या बखरी, जुने करारनामे, सारांश जी जी जुनी लिहिलेली चिटोरी सापडतील त्याला सुद्धा वाङ्मय म्हणून कवटाळणारे लोक सापडतात. परंतु या अत्यंत व्यापक अर्थी वाङ्मयाचे स्वरूप निश्चित करणे कठीण आहे व ते निरुपयोगी आहे. असले किरकोळ लेख वास्तविक वाङ्मयाच्या व्यापक अर्थात सुद्धा येत नाहीत. असले लेख इतिहासाची साधने किंवा इतर शास्त्रीय वाङ्मयाची साधने असतील, पण ते वाङ्मय पदवीस पोचत नाही.
वास्तविक ` वाङ्मय’ शब्दाच्या व्यापक अर्थाला सुद्धा थोडीशी मर्यादा आहे. ज्ञान, मनोरंजन किंवा उपदेश करण्याच्या बुद्धीने मुद्दाम लिहिलेले लेख किंवा ग्रंथ म्हणजे व्यापक अर्थाने वाङ्मय होय. अशा वाङ्मयाचे दोन वर्ग होतात. एक शास्त्रीय वाङ्मय, दुसरे ललित वाङ्मय. सृष्टिकृत किंवा मनुष्यकृत वस्तुजाताचे किंवा त्याच्या एका भागाचे ज्ञान किंवा माहिती वर्णन करणारे वाङ्मय ते शास्त्रीय वाङ्मय होय. सत्यस्वरूप यथातथ्य कथन करणे हा या वाङ्मयाचा मुख्य उद्देश असतो. या सत्य स्वरूपाचे आकलन, अवलोकन व तर्क या मानवी मनाच्या शक्तीच्या योगे होते. अर्थात असले शास्त्रीय वाङ्मय हे त्या त्या विषयांची गोडी अगर गरज असणाराकरता असते. गणितशास्त्राचे वाङ्मय गणित्याला उपयोगी. वनस्पतिशास्त्राचे वाङ्मय तज्ञाला उपयोगी, सामान्यजनाला त्याचे काय होय? असल्या वाङ्मयाचा उपयोग सामान्य जनाकरिता नसतो. पण ललित वाङ्मय हे सर्वांकरिता असते. ते सर्व स्त्री पुरुषांच्या प्रीतीस पात्र होण्यासारखे असते. त्यातील विषय सर्वांना समजण्यासारखे असतात; सर्वांच्या अनुभवाचे असतात; व सर्वांना त्याची आवड असते. ललित व सर्वांना त्याची आवड असते. ललितवाङ्मयाचा उद्देश ज्ञान देणे किंवा माहिती देणे हा नसतो; तर मनुष्याचे मनोरंजन करणे व त्याच्या मनोवृत्ती उद्दीपित करणे हा असतो.
या ललित वाङ्मयोदयाच्या बुडाशी मानवी मनाच्या चार प्रवृत्ती असतात. पहिली, आपल्या मनातील विचारविकार दुसऱ्यास व्यक्त करून दाखविण्याची उत्कट इच्छा; दुसरी मानवजात तिच्या हातून घडणारी कृत्ये यांबद्दलचा आपलेपणाचा भाव; तिसरी, आपण राहतो ती सत्यसृष्टि व मनुष्याने कल्पनेने निर्माण केलेली कल्पना. सृष्टि यांची आवड; व चवथी, व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा रमणीय रूपरंग वगैरे सौंदर्यपोषक गुणांची गोडी. काही लेखकांच्या मते तर ललितवाङ्मय मानवी मनाची सौंदर्यप्रतीति हा खरा आत्मा आहे. कारण ललितवाङ्मय ही ललितकलासप्तकापैकी एक कला आहे असे मानण्यात येते. आता ललितकलांचा उद्देश सृष्टीतील वस्तुजातामध्ये गूढ असलेले सौंदर्य व त्यात भरलेली भव्यता यांचे आविष्करण करणे होय. वस्तुजातातील सत्याविष्करण हा शास्त्राचा उद्देश आहे, तर वस्तुजातीतील सौंदर्याविष्करण हा ललितकलांचा उद्देश आहे. मनुष्य आपल्या बाह्य डोळ्यांनी व आपल्या बुद्धीने वस्तुंच्या स्वरूपाचे आकलन करतो. बुद्धि ही पृथक्करणात्मक आहे. ती अवलोकनाने वस्तूचे अवयव, अन्तर्भाग व ज्ञानेंद्रियांनी कळणारे रूपरसादि गुण इत्यादि जाणू शकते, व अशा तऱ्हेचे पृथक्करणात्मक व इंद्रियगोचरगुणात्मक स्वरूप सांगणे हे शास्त्रीय वाङ्मयाचे काम आहे, तर मानवी प्रतिभाशक्तींना गोचर होणारे वस्तुजातातील अतिंद्रिय सौंदर्य व भव्यता यांचा सर्वांना प्रत्यय आणून देणे हे ललितकलांचे काम आहे. अर्थात ललितवाङ्मयाचेही तेच कार्य आहे. म्हणून ललितवाङ्मय हे बुद्धिप्रभावाने उत्पन्न होत नाही.
बुद्धीने मनुष्य शास्त्रीय ज्ञान मिळवील, किंवा शास्त्रीय ज्ञानाचे आकलन करू शकेल. पण बुद्धिवान मनुष्य ललितवाङ्मय निर्माण करू शकणार नाही. त्याला प्रतिभाशक्ती किंवा कल्पनाशक्ती यांची जरूरी आहे. हिलाच कविप्रतिभा म्हणतात. ही दिव्य दृष्टीप्रमाणे आहे. ती सर्व मनुष्यात असतेच असे नाही. ही एक उपजत शक्ति आहे. ती मेहनत करून साध्य होणार नाही. म्हणूनच ललितवाङ्मय निर्माण करण्याला त्या जातीचेच मनुष्य पाहिजे. ते येरा गबाळाचे काम नाही. ही दिव्य दृष्टी ज्याला आहे त्याला प्रत्येक वस्तुंतील अन्तर्गूढ सौंदर्य दिसते. म्हणून ललित वाङ्मयाला कोणताही विषय वर्ज्य नाही. प्रतिभावान माणूस कशाबद्दलही लिहो, त्याचे लिहिणे ललितवाङ्मय बनते. याच कारणाने कित्येक कवींची यदृच्छया लिहिलेली पत्रे, त्यांच्या रोजनिशा, त्यांचे लिहून ठेवलेले स्वगत विचार किंवा आत्मचरित्र, सारांश त्यांच्या लेखणीतून निघालेले प्रत्येक वाक्य ललितवाङ्मय पदाप्रत पावते. पण हा त्यांच्या प्रतिभेचा प्रभाव आहे. त्याचा प्रकाश सर्वत्र पडतो. पण काही पत्रे, चिटोरी टिपणे वगैरे ललितवाङ्मय पदवीला पावलेली आहेत, म्हणून अशा प्रकारचे सर्वांचे लिहिणे ललितवाङ्मय होऊ शकते, असे मात्र नव्हे. जुन्या सर्व कागदपत्रांना ललितवाङ्मय मानणारांची येथेच चुकी होते. असो.
प्रत्येक देशांत प्रथमतः निर्माण होणारे ललितवाङ्मय प्रायः पद्यरूप असते. कारण पद्य हे तालसुरावर म्हणता येते. अर्थात ते संगीत कलेत अन्तर्भूत होते. म्हणूनच ललितवाङ्मय म्हणजे कविता, पद्य किंवा काव्य असा समज होतो. पण पद्य हे ललित वाङ्मयाचे आवश्यक अंग आहे असे नाही. नव्हे, देशाच्या व भाषेच्या प्रगतीबरोबर गद्याचा प्रचार चालू होतो व काले करून पद्यापेक्षा गद्याचा प्रसार जास्त होतो. तेव्हा ललितवाङ्मयाचे पद्य व गद्य असे वर्गीकरण करणे बरोबर नाही. कारण अमरकोशासारखे पद्य ललितवाङ्मय अगर काव्य या रूपाप्रत पावत नाही; किवा शास्त्रीय ज्ञानाकरिता लिहिलेले गद्यही काव्य या पदवीस पावत नाही. ललितवाङ्मयाचा आत्मा म्हणजे सौंदर्याविष्करण होय. मग ते आविष्करण पद्यरूपाने झालेले असो की गद्यरूपाने झालेले असो. या ललित वाङ्मयाचे सामान्यतः पाच वर्ग करतात. पहिला प्रकार कविता, दुसरा प्रकार नाटके, तिसरा प्रकार कादंब-या, चवथा प्रकार छोट्या गोष्टी व रूपके आणि पांचवा प्रकार निबंध. मराठीतील निबंध शब्द मात्र संदिग्ध आहे. निबंध म्हणजे लहान आटोपशीर लेख. पण तो शास्त्रीयही असेल किंवा ललितवाङ्मयात्मक ही असेल. ललितवाङ्मयाच्या पाचव्या प्रकारातून अर्थात शास्त्रीय निबंध वगळले पाहिजेत.
प्रबोधनकार रा. ठाकरे यांचे `स्वाध्याय-संदेश’ या नावाने प्रसिद्ध होणारे निवडक निबंध ललितवाङ्मयाच्या पाचव्या प्रकारचे आहेत. हे निबंध एकंदर एकवीस बावीस आहेत. यापैकी निम्मे अधिक ऐतिहासिक-महाराष्ट्रैतिहासिक आहेत. पण ते ऐतिहासिक सत्य सांगण्याच्या बुद्धीने किंवा ऐतिहासिक सत्यान्वेषण बुद्धीने लिहिलेले नाहीत. काही निबंध तात्विक विषयावर हेत, पण ते तत्वान्वेषण बुद्धीने लिहिलेले नाहीत. काही निबंध क्षणिक तात्कालिक प्रसंगासंबंधी आहेत, पण तेथेही तात्कालिक वर्णनावर भर नाही. या सर्व निबंधांना एकत्र करणारे सूत्र म्हणजे ठाकरे यांच्या धार्मिक सामाजिक भावना होत. ते समाजाच्या प्रत्येक बाबीसंबंधी `नवमतवादी’ आहेत. त्यांना जुने भिक्षुकशाहीचे बंड मोडावयाचे आहे; त्यांना जातिनिर्बंध शिथिल करावयाचे आहेत; त्यांना आचारविधीचे वर्चस्व नाहीसे करावयाचे आहे; त्यांना समाजाचे गतानुतिकत्व घालवून टाकावयाचे आहे. नव्याजुन्याच्या कलहात नव्याचा पक्ष स्वीकारून त्यांना समाजामध्ये नव्याची आवड उत्पन्न करावयाची आहे.
सारांश रा. ठाकरे हे समाजाच्या सर्वांगीण सुधारणेचे भक्त आहेत व ही समाजसुधारणा-भक्तिरूपी भावना तरुण पिढीत उद्दीपित करण्याचे त्यांच्या निबंधाचे ध्येय आहे. त्यांचे हे सर्व लेख भावनाप्रधान आहेत. त्यात जुन्या मतावर व जुन्या मताभिमान्यांवर मर्मभेदी कडक टीका आहे. त्यात नव्या मतांचा जोराचा व जोरदार भाषेत पुरस्कार केलेला आहे. त्यात ऐतिहासिक प्रसंगांच्या अनुषंगाने देशप्रीतीची ज्योत जनमनात प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात अल्पसंतोषी निवृत्ती मार्गाचा निषेध करून, महत्त्वाकांक्षी प्रवृतिपरतेची दवंडी पिटविली आहे. तात्पर्य, हल्ली आपल्या समाजस्थितीत ज्या ज्या भावनांची व ज्या ज्या उच्च मनोवृत्तीची आपल्याला जरूर आहे, त्या त्या भावना व त्या त्या उच्च मनोवृत्ती तरुणतरुणीच्या अंतःकरणात उद्भुत व्हाव्या, अशा धोरणाने रा. ठाकरे यांनी आपल्या निबंधांची रचना केली आहे व ती रचना बरीच यशस्वी आहे, यात शंका नाही.
प्रायः कवितेत दुग्गोचर होणारे रूपक, उत्प्रेक्षा, अनुप्रास, श्लेष इत्यादि अर्थालंकार व शब्दालंकार गद्य वाङ्मयात खच्चून भरण्याचा संप्रदाय कै. गडक-यांनी घातला. विशेषतः अनुप्रासमय गद्य लिहिण्याची हातोटी गडक-यांना उत्तम साधली होती. हा गद्यप्रकार चमत्कृतिजनक असल्यामुळे त्याची गोडी जनमनाला फार लागलेली दिसते. यामुळे या गेल्या दहा वर्षांत असले गद्य लिहिण्याकडे लेखकांचा फार ओढा दिसून येतो. गडक-यांच्या या विशेषाचे जिकडे तिकडे अनुकरण होऊ लागले आहे व ठाकरे यांनी या निबंधात असा प्रयत्न पुष्कळ ठिकाणी केलेला आहे. पण या बाबतीत लेखकाची अतिशयतेकडे प्रवृत्ति होण्याचा संभव आहे. असे झाले असता भाषापद्धतीला कृत्रिमपणा जास्त येतो व मग पुष्कळ ठिकाणी अर्थहानि होते. अर्थहानि न होता किंवा द्विरुक्तीचा दोष न येता सहज अनुप्रास साधल्यास तो आनंददायी होतो ही गोष्ट खरी आहे, पण कृत्रिमता व पुनरुक्ति दोष व अर्थहानि हे दोष ललित वाङ्मयात न येण्याची खबरदारी लेखकाने घेतली पाहिजे.
रा. ठाकरे यांची भाषापद्धती ओजस्वी आहे, त्यांच्या भाषेचा ओघ अमोघ आहे; त्यांत चमत्कृतीही पुष्कळ आहे व वर निर्दिष्ट केलेले दोष होऊ न देण्याची खबरदारी रा. ठाकरे घेतील, तर त्यांचे लेख जास्त सरस व जास्त परिणामकारक होतील यांत शंका नाही. असे जास्त सरस व जास्त परिणामकारक वाङ्मयात्मक लेख रा. ठाकरे यांच्या लेखणीतून उतरोत व त्यांच्या स्वाध्यायसंदेशाचा ध्वनि सर्व महाराष्ट्रभर दुमदुमत राहो, अशी इच्छा करून ही घाईघाईने लिहिलेली प्रस्तावना पुरी करतो.
गोविंद चिमणाजी भाटे
विलिंग्डन कॉलेज, सांगली
ता. १४ जानेवारी १९२३
लेख १
कृष्णं वन्दे जगद्गुरुम्।
आज गोकुळात आनंदीआनंद चालू आहे. संसारचक्रात रात्रंदिवस सुरू असलेल्या आधिव्याधींना दूर लोटून, एक दोन घटकाच का होईना, आबालवृद्ध हिंदुधर्मी नरनारीजन जय कृष्ण कृष्ण जय, जय कृष्ण कृष्ण जय या पुण्य नामस्मरणात तल्लीन झाले आहेत. आजचा आनंद निर्व्याज. सूर्योदयाबरोबर अमरणा-या कमळाप्रमाणे शुद्ध, सात्विक आणि प्रत्येक मनाची कळी विकसित करणारा हा आनंद बिनतोड आहे. शेकडो शतकांच्या पूर्वी भारतीय इतिहासाच्या पृष्ठाला भाग्यवान करणारी ती श्रीकृष्णजयंती, जणू काय अगदी आजच पहिल्यांदा साजरी हत आहे, अशा कल्पनेचा भडक भाविक रंग आजच्य आनंदात भरपूर मिसळल्यामुळे तर त्याची गोडी गोडपणातच अमृताशी खात्रीने स्पर्धा करील. आज कोठेही कान द्या, तेथून कृष्ण भगवंताच्या पुण्य नामसंकीर्तनाच्या मुरलीचा मधुर ध्वन ऐकू येईल. आज कोठेही दृष्टी फेका, त्या पूर्णावतार परमात्म्याचा जयंत्युत्सव लहान मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याच डोळ्यांना दिसेल. आसेतुहिमाचल एकूण एक हिंदू देवमंदिरांत `गोविंद घ्या हो, गोपाळ घ्या हो’ या विशुद्धतम प्रेमाच्यादहगीकाल्याची आग्रहाची देवघेव अहमहमिकेने चालू आहे. शेकडो शतकांपूर्वी श्रीकृष्णाने केलेल्या-केल्या असे सांगितलेल्या-बालक्रीडांच्या नकरला कोठे वठविल्या जात आहेत; तर कोठे दहीहंडी फोडून त्याखाली लहान लहान मुले `गोविंदा गोविंदा’ कल्लोळात अनुपमेय हर्षाच्या लहरींवर बेभान नाचत आहेत. रास्क्रीडेची हुबेहूब नक्कल वठवायला गोपींची मोठी अडचण; पण, काही पुरुषांनाच तात्पुरत्या गोपी मानून, त्यांच्याबरोबर दहा किंवा एकवीस पदरी गोफ टिप-यांच्या ठेक्यावर विणण्यासाठी कोठे काही नर्तनकुशल बंधू आपल्या लवचिक अंगाच्या वळणदार घडीची कसरत दाखवून प्रेक्षकांना थक्क करीत आहेत; तर कोठे मल्लविद्याविशारद तरुण जवान स्वतःला श्रीकृष्णाचे खास सवंगडी समजून, आडाखेबाज कुस्त्यांच्या पेचांनी आपापल्या आखाड्याचे नाव राखण्यासाठी हमरीतुमरीच्या दंगलीत दंग झाले आहेत. ठिकठिकाणी कृष्णजन्माच्या इतिहासाचे आख्यान लावून, त्यावर गानाभिनयकुशल हरिदास साग्रसंगीत कथेचे व्याख्यान करीत हेत. आज प्रत्यक्ष आपल्या दृष्टीसमोर श्रीकृष्ण भगवंताचा जन्म झाला आहे, त्याला हरिदास आता मंगलस्नान घालतील, काजळ तीट उटी लावतील. बाललेणे चढवतील, मग पाळण्यात घालून त्याला झोके देतील, या सर्व गोष्टी आता आपण पाहून, त्या पाळण्याच्या झोक्याबरोबरच आनंदाच्या डोल्हा-यांत क्षणभर आपल्या आत्मारामालाही `जो जो जो जोरे’ करण्याची महापर्वणी साधून घेऊ, म्हणून आबालवृद्ध स्त्रीपुरुष, हरिदासाच्या मुखगंगेतून स्रवणारा एकेक शब्द कानांच्या ओंजळीत झेलण्यासाठी आतुरचित्त स्तब्ध बसले आहेत. उघडाउघड ही सारी नक्कल, शुद्ध नाटकातली बनावट, कल्पनेलाही थांग न लागणा-या अशा प्राचीनतम इतिहासाची नुसती बतावणी. पण काय चमत्कार आहे पहा! या कृष्णजयंतीच्या प्रसंगी ते हजारो वर्षांचे जाडजूड कालपटल भक्तांच्या भावनेचा उदय होताच धुक्याप्रमाणे वितळून नष्ट होते आणि वर्तमान मानवांच्या मनोवृत्तीचा दुव्वा कृष्णजन्माच्या आद्य दिवसाला बेछूट भिडून, दुनियेच्या जागत्याज्योत भावनेच्या मुर्वतीसाठी, भूतकाळच वर्तमानकाळाचे लेणे पांघरून दरसाल उभा ठाकतो! एकूण भावनेचा पराक्रम विलक्षण खरा. पीतांबराचे गुंडाळे करून त्याचा बनविलेला बाळकृष्ण तो काय, पण त्यालाच पाळण्यात घालून हरिदास झोके घालू लागले व मधुर संगीताच्या गायनात `बाळा जो जो रे’ हे गीत गाऊन त्याला आळवू लागले की देवळाच्या एका अंधे-या अडचणीच्या जागेत दाटी करून बसलेल्या आमच्या मातांची, आमच्या भगिनींची चित्तवृत्ती किती उचंबळून येते बरे! स्त्रीजात म्हणजे मातृवत्सल्याचा जिवंत झरा. वयाच्या कमी अधिक प्रमाणानुसार हा झरा सूक्ष्म किंवा प्रौढ झालेला असतो. अर्थात या वेळी त्यांची मुखश्री प्रसन्नतेने डवरते. त्यांची काया पुत्रवात्सल्याने रोमांचित होते. श्रीकृष्ण-भक्तीचा सारा ठेवा त्यांच्या डोळ्यात एकवटतो व पाळण्याच्या प्रत्येक येरझारीबरोबर त्यातला एकेक बिंदु त्यांच्या गालावर टिबकतो.
हा प्रकार शेकडो वर्षें दरसाल नियमित चालला आहे. वर्षातून एक दिवस भक्तीच्या भावनेला कढ येतो व उत्सव-समाप्तीबरोबरच तो थंड होतो. सांप्रतची कृष्णजयंती शुद्ध कवायती आहे. त्यात भावनावश अज्ञ जनतेला किंचित काळ जरी उदात्त अशा जीवशिवाच्या साधर्म्याची चुणूक भासते, तरी मानवजातीच्या उत्क्रान्तीसाठी व राष्ट्रधर्माच्या प्रगल्भतेसाठी श्रीकृष्ण भगवंताने धर्मवीर, राष्ट्रवीर आणि पुरुषोत्तम नरवीर अशा तीन निरनिराळ्या भूमिका स्वतःच्या चारित्र्यांत केंद्रीभूत करून धार्मिक, राजकीय आणि सामाजिक बाबतीत, अखिल मानव जातीचे-जगाचे-जगद्गुरुत्व केवढ्या अढळ यशस्वितेने मिळविले, याचा मात्र या उत्सवप्रसंगी कोणी फारसा विचार करीत नाही. पुराणकारांनी आपल्या काव्यमय मेंदूतून प्रसविलेल्या भागवतातील श्रीकृष्णचरित्राच्या अतिशयोक्तीपूर्ण बाललीला व यौवनक्रीडा आमच्या पचनी जशा लवकर पडतात, तशी त्या पुरुषोत्तमाची भारतांतर्गत इतिहाससिद्ध राष्ट्रसेवा किंवा त्या जगद्गुरुची गीता-प्रतिपादित प्रबोधनाची दिव्य कामगिरी आमच्या गळी उतरण्याची मारामार पडते. या दिशेने कोणी प्रयत्नच करीत नाही. आजकालचे हरिदास म्हणजे शुद्ध नर्मदेचे गोटे किंवा ठराविक परंपरेच्या मार्गातले धोटे. मोटेच्या बैलांप्रमाणे पुढे मागे हेलपाटे घालण्यापलीकडच्या अकलेची आणि त्यांची पुरी फारकत. श्रीकृष्ण सवंगड्यांबरोबर खोखोचा खेळ कसा खेळला, याचे साभिनय पोरकट प्रदर्शन करण्याऐवजी त्या आडाखेबाज मुत्सद्याने मोठमोठ्या मी मी म्हणणा-या राजकारणपटूंच्या स्वार्थी डावपेचांवर आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा मात करून खो खो कसा घातला, हे या हरिदासांनी का सांगू नये? रासक्रीडेतील किंवा जलक्रीडेतील गोपिकांच्या नग्न विहाराच्या घाणेरड्या काल्पनिक गोष्टी रंगवून सांगताना, स्वतःच्या मनोवृत्तीला बीभत्स विकारांच्या खाते-यात चुबकण्यापेक्षा, गीतेतील भक्तियोगाच्या रहस्याची निरनिराळी प्रमेये हे रंगेल हरिदास जर श्रोत्यांच्या मनाव बिंबविण्याचा यत्न करतील, तर कोणी त्यांच्या जिभेस डाग का देणार आहे? उत्सवप्रसंगी मुद्दाम जमलेल्या काही खेळाडूंकडून दसपदरी गोफ विणण्याचा धांगडधिंगा करण्यापेक्षा, भगवंताने आपल्या गीतेत भक्ति, ज्ञान आणि कर्म या तीन योगांचा केलेला राष्ट्रोद्धारक संयोग श्रोत्यांना हरिदासाने नीट उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला, तर त्या टाळकुट्याला कोणी फासावर का लटकविणार हे? हातातल्या टाळाने किंवा टिपरीने, छटाकभर दही आणि गाडगाभर पाणी भरलेली, दहीहंडी फोडून त्या खाली मुलांना नाचविण्याचा नाचरा प्रकार बंद करून, त्या ऐवजी कुकल्पनेची हंडी फोडून निश्चित तत्त्वनिर्णयाचा दुग्धवर्षाव श्रीकृष्णप्रभूने सा-या पृथ्वीवर कसा पाडला, याची विवेकशुद्ध माहिती हरिदास आपल्या श्रोत्यांना सांगण्याचा प्रघात पाडतील, तर त्यांचे कोणी डोके का फोडणार आहे? श्रीकृष्णाने केल्या म्हणून सांगण्यात येणा-या कृतीच्या नकला करण्यातच जयंत्युत्सवाचे सारसर्वस्व मानणा-यांना भगवंताच्या भारतग्रथित अनेक पराक्रमांच्या नकला करण्याची छाती का बरे होऊ नये? भगवंताने जगाच्या उद्धारार्थ गीता सांगितली, तशी दुसरी एखादी सवाई गीता सांगण्याचे मर्त्य मानवाचे तोंड नसले तरी, भगवद्गीतेचे रहस्य आत्मद्धारार्थ आचरणात आणताना आपले हातपाय खचित कोणी बांधणार नाही. नकला करूनच उत्सव साजरा करायचा, तर त्या नकला निदान अशी तरी कृत्यांच्या करा की जेणेकरून आत्मोद्धारातच जगद्धुदाराची गुरुकिल्ली सापडेल.
आज आपल्यापुढे भागवतातील व भारतातील अशी दोन परस्पर-विरुद्ध श्रीकृष्णाची चरित्रचित्रे आहेत. यापैकी पहिले एकांगी व काल्पनिक आहे आणि दुसरे इतिहाससिद्ध असून विवेकबुद्धीला पटणारे आहे. भागवती कृष्णरित्रात भिक्षुकशाही मूर्खपणा खच्चून भरला असून, त्याच्या प्रभावाचा पाया अज्ञ जनांच्या अंधश्रद्धेवर उभारलेला आहे; तर भारतांतर्गत श्रीकृष्णचरित्रात ऐतिहासिक सत्याचे उज्वल तेज अपरंपार झळकत असून, त्याची उभारणी विवेकमान्यतेच्या न्यायनिष्ठूर पायावर झालेली आहे. भागवत ही कादंबरी आहे व भारत हा इतिहास आहे. कादंब-या काल्पनिक अतएव असत्य असतात, इतिहास तपशील-शुद्ध म्हणून सत्य असतो. हा एवढा भेद जर आपण विचारात घेतला तर बनावट चलनी नाण्याप्रमाणे व्यासाच्या नावाखाली दडपलेल्या बोपदेवकृत भागवत कादंबरीतील कृष्णचरित्राचा त्याग करून, कोणीही विवेकी सज्जन भारतात उमटलेल्या जगद्गुरु कृष्णाच्या चारित्र्यावर आपली विवेकपूर्ण स्वाध्यायवृत्ति खिळविल्याविना खास राहणार नाही. भागवती कृष्णचरित्राने जनतेच्या अंधश्रद्धाळू भावनाप्रधान वृत्तीचा भरपूर फायदा घेऊन, भारतवासियांना पुरुषोत्तम श्रीकृष्माच्या ख-या चारित्र्याला सर्वस्वी पारखे केले आहे. या मुद्याकडे आता किती दिवस श्रीकृष्णभक्त डोळेझांक करणार?
श्रीकृष्णाला पूर्णावतार मानतात. त्याला पुरुषोत्तम (Superman) म्हणतात. व्यासासारखे महर्षि त्याला जगद्गुरु असे संबोधून, कृष्णं वन्दे जगद्गुरुम म्हणून प्रणाम ठोकतात. हिंदुस्थान स्वत्वपराङ्गमुख झाला. स्वातंत्र्यातून पारदर्शक गुलामगिरीत अवनत झाला. राजकीय अधःपाताच्या जोडीने त्याच्या समाजघटनेच्या राईपेक्षाही क्षुद्र वृत्तीच्या परकीयांनी त्याच्या विपर्यासावर आपल्या विद्वत्तेची कंडु शमवून घेतली. इतके झाले तरी पुरुषोत्तम श्रीकृष्णाचे जगद्गुरुत्व आजदिनतागायत एकजात विवेकी दुनियेने मान्य करावे; त्याच्या भगवद्गीतेची पारायणे गेल्या महायुद्धप्रसंगी फ्रान्सच्या समरभूमीवर अनेक इंग्रज, फ्रेंच, जर्मन आणि अमेरिकन लढवय्यांनी करून, आपल्या चित्ताला प्रसन्नतेचा प्रसाद प्राप्त करून द्यावा, आणि हजारो चिकित्सक पाश्चिमात्य विवेवकवाद्यांनी सर्व धर्मपंथांचा तुलनात्मक अभ्यास करून, अखेर आमूलाग्र गीतावादी बनावे; हा चमत्कार सर्व हिंदुंनी विचार करण्यासारखा आहे. आजला जगद्गुरु श्रीकृष्णाची गीता जगातील बहुतेक प्रगल्भ भाषांचे लेणे लेवून नऊखंड दुनियेच्या हृदयाला, गूढ तत्त्वरहस्याच्या निश्चित निर्णयाने, शांत करीत आहे. फ्रान्सातले फ्रेंचजन आज फ्रेंच भाषेत गीतेचे अध्ययन करीत आहेत जर्मनीतले जर्मन आज श्रीकृष्णाच्या गीतामुरलीचे सनातन मंजुल ध्वनी जर्मन भाषेत ऐकून आनंदाने डुलत आहेत. डॅन्टेच्या चिरंजीव काव्यववाणीने सालंकृता झालेल्या इटालियन वाग्देवीलाही, भगवद्गीतेने आपल्या अनुपमेय तत्त्वज्ञानाचे पैंजण तोड अर्पण करून, जीवशिवाच्या अभेद भावाची गाणी गात नाचावयास लाविले आहे. सा-या जगाला पुरून उरणा-या इंग्रजी भाषेच्या द्वारे श्रीकृष्ण जगद्गुरुंचा गीता-संदेश आज `पृथिव्यां सर्वमानवा’ची खासगत जहागीर होऊन बसला आहे. या सर्व दिग्विजयाचे श्रेय जर कोणाला असेल तर ते `जगद्गुरु’ म्हणून मिरवणा-या पुडीबहाद्दर मुंडितशीर्ष भिक्षुकप्रणींना नसून, थिऑसॉफिकल सोसायटी व कृष्णभक्त मिसेस आनी बेझंट यांच्याकडेच ते बिनचूक जाते, हे कृतज्ञतापूर्वक नमूद करणे प्रबोधनाचे कर्तव्य आहे.
जगद्गुरु श्रीकृष्णाच्या गीतारहस्याच्या बिनीच्या भगव्या जरतारी झेंड्याने आज सर्व विवेकी दुनिया काबीज केली आहे. अल्पसंख्य विवेकी दुनिया हस्तगत करण्याचेचकार्य मोठे कठीण. बहुसंख्य अविवेकी दुनियेचे पेंढार कितीही अफाट पसरलेले असले, तरी सच्चा रणशूर शिपाई त्याची केव्हाही क्षिति बाळगीत नाही. रानामोळ भटकणा-या शेकडो क्षुद्र कोल्ह्यांकडे दुर्लक्ष करून मर्द शिकारी एका वाघासाठीच आपल्या तिरंदाजीचा रोख सांभाळून जंगल तुडवीत असतो. बाजारबुणग्यांची पर्वा बाजारबुणग्यांनी करावी. जगज्जेता वीर आपल्या सामन्याच्या समतोल वीराला एकाच सरसंधानाने घायाळ करून चुटकीसरसा त्याच्या साम्राज्याच्या अधिपती बनतो. श्रीकृष्णाच्या कर्मज्ञानभक्तिप्रधान गीतेने याच धोरणाने आजही सारी दुनिया पादाक्रांत केली आहे, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. बिनीच्या भगव्या जरतारी झेंड्याने पुढचा मार्ग तर छान चोखाळून ठेवला आहे. आता कृष्णानुयायी भारतीयांनी एकच लगट करून त्या मार्गावर धडाडीची चाल केली, तर कृष्णं वन्दे जगद्गुरुम् या उच्चारासरसे श्रीकृष्ण भगवंताला प्रणिपात करम्यासाठी अखिल मानव दुनियेचे हात भराभर वर व्हायला अवधी का लागणार आहे?
जगातील इतर धर्मपंथांचा पाया उपयुक्ततावाद (Utility) वर सजविलेला आहे. जनता निष्क्रीय झाली म्हणून एका महात्म्याने कर्मयागाचा संदेश दिला, पण ज्ञान व भक्तीकडे पाहिले नाही. दुस-या महात्म्याने ज्ञानाचा संदेश जगाला सांगितले, पण भक्तिचा ओलावा आणि कर्माचा कणखरपणा यांचा समन्वय केला नाही. तिस-या महात्म्याने भक्तिचा कर्णा फुंकून सा-या जगाला बेभान नाचावयास लाविले, पण त्याचे कर्म व ज्ञान हे दोन डोळेच फोडून टाकले. याचा परिणाम असा होत गेला व अजूनही होत आहे की जनता कधी शुद्ध अध्यात्मवादी, कधी कणखर अर्थवादी व धर्मलंड, कधी केवळ वावदूक ज्ञानी परंतु शुष्कहृदयी, तर कधी `हे खरे का ते खरे’ असल्या अनिश्चित संशयवादात गुरफटलेली, कधी संन्यासी तर कधी संसारी, कधी विचारी तर कधी विकारी.
याचे कारण त्या त्या पंथप्रवर्तक महात्म्याचा (युटिलिटॅरियन) उपयुक्ततावादी बाणा व धोरणाची एकांगी वाढ हे होय. परंतु श्रीकृष्णाचे गीतेत प्रतिबिंबित झालेले चारित्र्य, त्याच्या आचाराची व विचाराची परस्पर-संवादी एकतानता आणि मानवी जीवनाच्या उत्क्रांतीच्या नानाविध पाय-या क्रमवार आखून देण्याची त्याच्या तत्त्वज्ञानाची नानारंगी पण एकजिनसी धाटणी, नीट काळजीपूर्वक स्वाध्यायात घेतली म्हणजे, भक्तियोगाच्या ओलसर क्षेत्रात, कमी योगाची दणकट लागवड करून, ज्ञानयोगाच्या सर्वस्पर्शी जीवनाने, मानवांच्या सर्वांगीण उत्क्रांतीचा मळा चौफेर एकजात एकसारखा पिकविण्याची त्या भगवंताची योगकुशलता, आचरट अहंमन्यांशिवाय, वाटेल त्या विवेकी मुमुक्षूला संशयछिन्न केल्याशिवाय खास राहणार नाही. श्रीकृष्णाचे चारित्र्य एकांगी नव्हे, अनेकांगी आहे. गीतेचे तत्त्वज्ञान संसा-याला व संन्याशाला, अर्थवाद्याला व ज्ञान्याला, धार्मिकाला व राजकारण पंडिताला, जाणत्याला व नेणत्याला, सर्वांत पद्धतशीर समभावाने उत्क्रांतीचा मार्ग बिनचूक दाखविणारे सनातन होकायंत्र आहे. श्रीकृष्णाला पूर्णावतार व पुरुषोत्तम म्हणतात का, याचे कोडे उलगडू पाहणारांनी प्रथम या गीता-होकायंत्राची यंत्ररचना उलगडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रीकृष्णाने आपल्या भक्तांना सांगून ठेवलेला संदेश आज आपण कृष्णजयंतीच्या उत्सवकाली विचारात घेऊन आचारात उमटविला पाहिजे. कृष्ण भगवंताच्या जगद्गुरुत्वाची आज जगाला जरूर आहे. चालू जगातली सामाजिक, धार्मिक, राजकीय व आंतरराष्ट्रीय प्रमेयांची अनेक खट्याळ खेकटी सुव्यवस्थित उत्क्रांतीच्या मार्गावर आणण्यासाठी श्रीकृष्ण सर्व अनुयायांना हाक मारून संदेश देत आहे –
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ।।
हे धनुर्धारी पार्था, हा निष्क्रिय नामर्दपणा सोडून दे. छेः! माझा भक्त म्हणविण-याला हा नेभळेपणा मुळीच शोभत नाही. दे दूर झुगारून तो मनाचा कमजोरपणा आणि ऊठ दंड थोपटीत जिवंत मर्दाप्रमाणे, भारता, कसल्या भिकारीड्या क्षुद्र कल्पनांचा तू गुलाम बनला आहेस! जा. यच्चयावत् जगाच्या कोनाकोप-यांत जाऊन भिडेल इतक्या जोराने माझ्या गीतेची भक्ति-ज्ञान-कर्मप्रधान संदेशाची तुतारी फूंक. अभेदभावाने त्या माझ्या गीताज्ञानाचा सा-या मानवी दुनियेवर मुसळधार पाऊस पाड आणि जातपात, वर्णभेद, देशभेद, राष्ट्रभेद इत्यादी सर्व भेदांचा कंस ठार मारून, सर्वांना
गीतारहस्याचा जाहीरनामा
वाचून दाखीव. सर्व मानवजातीतीतल व्यक्तिमात्राला ठासून सांग की बाबा, तुझ्यात पाप नाही, तुझ्यात दुःख नाही, तू हतबल नाहीस; तू मर्द आहेस, तू देवांचा देव – शक्तीचा खजिना आहेस, तो तूच आहेस. ऊठ, जागा हो आणि गीतेच्या प्रकाशाने आत्मज्ञानाची ओळख करून घे. क्लैब्यं मा स्म गमः पार्थ! प्रिय बंधुभगिनी वाचक जनहो, आज कृष्णजयंतीच्या मंगल काली हा दिव्य संदेश येता जाता दिसेल अशा ठिकाणी मोठ्या अक्षरांत लिहून ठेवा. त्याचे क्षणोक्षणी चिंतन करा म्हणजे लवकरच असा योग येईल की याच कृष्णजयंतीच्या दिवशी जगात जेथे जेथे म्हणून मानव आहे, तेथून तेथून त्याच्या तोंडून हाच जयजयकार निघेल की:-
कृष्णं वन्दे जगद्गुरुम्
[प्रबोधन, १६-८२२]
लेख २
बरोबर २९३ वर्षांपूर्वी!
येक या मागणें आतां । द्यावें तें मजकारणें ।
तुझा तूं वाढवी राजा । शीघ्र आह्मांचि देखतां ।।
दुष्ट संहारिले मागें । ऐसे उदंड ऐकतों ।
परंतु रोकडे काही । मूळ सामर्थ्य दाखवी ।।
रामदास म्हणे माझे । सर्व आतुर बोलणे ।
क्षणावे तुळजा माते । इच्छा पूर्णचि ते करी ।।
अ ब ब ब! तीनशे वर्षं होत आली आं? आता काय तीनशेला अवघी सातच वर्षे कमी! केवढा हा अवाढव्य आणि विस्तृत कालावधी! या लांबलचक कालावधीचा – एक लक्ष सात हजार चारशे दिवसांचा – चित्रपट आपल्या जिवंत स्मृतीच्या तिखट नजरेसमोर भरभर भरभर पुन्श्च उघडून नाचविला, तर या भाग्यवान महाराष्ट्राच्या राष्ट्रीय जीवनातले नानाविध सुखदुःखांचे देखावे हृदयातील विकारांना रटरट रटरट उकळी फोडीन, आपल्या चिमुकल्या छातीची कपाडे खडाखड उघडून टाकल्याशिवाय रहात नाहीत! लाखों दिवसांच्या अनंत श्रेणींनी अपरंपार रंगून निघालेला हा चित्रपट क्षणभर तसाच गुंडाळून ठेवा आणि आपल्या हृदयस्थ आत्मारामाला विचारा की हे आत्मारामा, आमच्या महाराष्ट्राचा राष्ट्रवीर आमच्या राष्ट्रीय भाग्याला उज्वल करणारा स्वातंत्र्यसूर्य कधी रे उगवला? तर तो स्मृतीच्या मूकभाषेत हेच उत्तर चटकन देईल की आजच. आज? आज तारीख ९ मे सन १९२१ इसवी रोजी? आत्मारामा काय म्हणतोस हे इतिहासाचा चित्रपट तरी उघडून पाहा. आजचा शक १५३९ नव्हे, प्रभवनाम संवत्सर नव्हे, अश्विनी नक्षत्र नव्हे, गुरुवारही नव्हे आणि ६ एप्रिल सन १६२७ तर नव्हेच नव्हे! नाही म्हणायला वैशाख महिन्यातली तिथी मात्र जुळते खरी. पण ती वार्षिक उत्सवाची तिथी होय. आमची चंचल स्मृति, ही पुण्यतिथी आणि आमची सद्यःस्थिती, हा त्रिवेणी संगम झाल्यामुळे महाराष्ट्रीयांच्या रोमारोमात स्वाभिमानाचा कंप उत्पन्न करणारी स्फूर्ती तर तुझ्या तोंडून आजच असे वदवीत नाही ना? कालमर्यादेच्या शतकांची गोष्ट राहू दे, एका दशकाच्या तडाख्यात मोठमोठ्या मी मी म्हणणा-या महापराक्रमी राष्ट्रांचे तीनतेरा झाले. त्यांच्या राष्ट्रवीरांच्या चारित्र्यांच्या, डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच, चिंधड्या चिंधड्या उडाल्या. ज्या राष्ट्रगीतांच्या नुसत्या धृपदाचा स्वर लष्करी वाद्यांतून प्रगट होताच शेळपटाचाही योद्धा बनून योद्धांच्या नसातले रक्त राष्ट्राभिमानाने तापून उसळ्या मारीत असे, तीच राष्ट्रगीते आजला कालव्यतीत आणि मृत ठरून गेली. सा-या पृथ्वीच्या गोलाला आवळ्याप्रमाणे स्वतःच्या मुठीत ठेवू म्हणून मिलिटरीझमच्या गर्जना करणा-या जर्मनीसारख्या उत्तान महत्त्वाकांक्षी राष्ट्राला आज प्राणान्ताचा घरघराट लागला आहे. हम करे सो कायदा असल्या दंडुकेशाहीच्या जोरावर सा-या रशियाच्या उरावर वरवंटा फिरविण्यातच आपल्या ऐश्वर्याची परमावधी मानणारी झारशाही बोलबोलता एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणे कवडी किंमतीच्या सोल्जरांच्या बंदुकांनाच बळी पडून आमूलाग्र धुळीस मिळाली. काळाचा झपाटा असा तीव्र वेगाने सुरू आहे की सूर्याभोवतालच्या पृथ्वीच्या एकाच प्रदक्षिणाकालात सांप्रत महासागरांचे पर्वंत बनून पर्वतांचे पाणी पाणी होत आहे. इतका भयंकर स्थित्यंतराचा रारगाडा सुरू असतानाही आमच्या परमपूज्य परमप्रिय श्रीशिवछत्रपतीची स्मृती पूर्वी जशी होती तशीच्या तशीच आजलाही अक्षय जिवंत रहावी, या चमत्काराचे गूढ काय बरे असावे? राजकीयदृष्ट्या महाराष्ट्र आजला जरी पतित आणि परावलंबी ठरलेला असला, तरी त्याचे अंतःकरण अजूनही श्रीशिवमय असल्यामुळे ते पूर्ण स्वतंत्रच आहे. त्याच्या हृदयाच्या अणुरेणूवर आद्य छत्रपतीची प्रतिमा णक्षय व खोलवर कोरली गेल्यामुळे, असल्या श्रिशिवमय झालेल्या महाराष्ट्राला जगातले कोणते राष्ट्र जिंकू शकेल?
महाराष्ट्र अजिंक्य आहे!
आमच्या शिवाजीचा महारा,ट्र स्वतंत्र आहे. आमच्या तानाजीचा मावळा नेपोलियनांची खाण आहे. आमच्या बाजी प्रभूची पावनशिंड म्हणजे सा-या जगाला पावन करणारी स्वातंत्र्याची माता आहे. छत्रपति संभाजीचा हा महाराष्ट्र म्हणजे हिंदुधर्माचे जागतेजाग धर्मपीठ आहे. बा महाराष्ट्रा! बिचा-या महाराष्ट्रा!! व्यक्त सृष्टीवर खिळलेली तुझी नजर जरा अव्यक्ताकडे वळीव.
तुझ्या विचारी दृष्टीचा कोन सध्या बहिर्मुख आहे तो अंतर्मुख करून क्षणभर
घूंगटका पट खोल रे!
म्हणजे यक्षिणीच्या कांडीप्रमाणे तुझी सध्याची मृण्मयावस्था सुवर्णाची छडी बनून, महाराष्ट्राच्या सात्विक पराक्रमाचा दरारा सा-या जगाच्या छातीवर हां हां म्हणता आपला धौशा गाजविल्याशिवाय खास राहणार नाही. आज महाराष्ट्राची दृष्टी बाहेरच्या व्यक्त सृष्टीवर खिळलेली असल्यामुळे त्याच्या राष्ट्रीय अंतःकरणाच्या संवेदनांची आणि त्याच्या मस्तकातील विचार-यंत्राची ताटातूट झालेली आहे. हा हृदयमस्तकाचा संयोग म्हणजे पॉझिटिव निगेटिवचा संयोग होय. हृदयरूपी डायनामोमध्ये अमोघ विद्युतशक्ति निर्माण झालेली आहे, पण निगेटिव पॉझिटिवचा संयोग झाला नाही तर ठिणगी कशी पडणार? शिवाजीच्या महाराष्ट्राने आपल्या शिवमय हृदयाची तार मस्तकातल्या विचारयंत्राशी जोडून देण्याचा यत्न करण्यातच त्याच्या राष्ट्रीय भाग्योदयाची खरी गुरुकिल्ली आहे, हेच महाराष्ट्राला सक्रीय व सप्रमाण पटवून देण्यासाठी १७व्या शतकाच्या दुस-या दशकात श्रीशिवछत्रपति महाराज या पुण्यश्लोक
राष्ट्रवीराचा जन्म झाला.
या पुण्यप्रभावशील जन्मदिवशी महाराष्ट्राच्या ख-याखु-या राष्ट्रीय संस्कृतीचे बिनतोड जातकर्म निश्चित ठरले गेले. महाराष्ट्रीयांनी आपले हृदय मस्तकांत मेंदूच्या अगदी शेजारी आणून स्थापन केल्याशिवाय त्यांचा राष्ट्रीय भाग्योदय होमार नाही, हा संदेश घेऊनच आमच्या राष्ट्रवीर छत्रपतीची स्वारी महाराष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षितिजावर बरोबर २९३ वर्षांपूर्वी उदय पावली, आणि आपल्या अनुपमेय पराक्रमांनी हा भूगोल त्यांनी दणाणून सोडला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा कोठे आहे व तो कोणत्या प्रयत्नांनी उद्दीपित होऊन आपल्या मायदेशाचे पांग फेडण्यास शक्त होईल, हे अचूक उमगणारा धन्वंतरी जर कोणी गेल्या अनेक शतकांच्या विस्तीर्ण कालावधीत जन्मला असेल तर तो एकच – अगदी `अनामिकासार्थवती बभूव’ करणारा एकच – भोसले कुलदीपक राष्ट्रवीर श्रीशिवाजी हाच होय. राष्ट्राचे नायकत्व पत्करून काजव्याप्रमाणे चटकन् चमकून पटकन् लुप्त होणारे किंवा तेरड्याप्रमाणे तीनच दिवसांत जन्मताच मृत्यु पावणारे नामधारी राष्ट्रवीर आजवर अनेक झाले, रोजच्या रोज धड्यापासरी उत्पन्न होत आहेत व पुढेही होत राहतील; तथापि राष्ट्रवीर या शब्दांत ज्या उदात्त रमणीय भावनांचा समावेश होतो, त्या सर्व भावनांचे एकीकरण झालेला सकल गुणालंकृत असा असामान्य बुद्धिमत्तेचा पुतळा या भाग्यवान महाराष्ट्रभूच्या कुसव्यात जर कोणी जन्मला असेल तर तो आमचा प्यारा प्राण शिवबाच होय. श्रीशिवजयंत्युत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे हृय फुरफुरू लागले. शीशिवाजीचा हा उत्सव घरोघरी करा असा आदेश करण्याचे वास्तविक काहीच कारण नाही. महाराष्ट्राच्या दिनचर्येचा असा एकही क्षण नाही की ज्या क्षणी अस्सल महाराष्ट्रीयांच्या श्वासोच्छवासात शिवो हम् शिवो हम् असा ध्वनि निघत नाही. श्रीशिवाजीमहाराज हे लोकमान्य, महात्मा किंवा दे. भ. या शुद्ध लौकिकी भावनेच्याही वरच्या कोटीतले होते. ते महात्मा होते किंवा नव्हते, ते देशभक्त होते किंवा नव्हते हा काथ्याकूट करणा-यांना शिवाजीची वास्तविक योग्यताच समजली नाही, असे म्हणणे भाग पडते. ते लोकमान्य होते पण अर्वाचीन लोकमान्यांप्रमाणे शुद्ध लोकछंदानुवर्ती मुळीच नव्हते. ते गोब्राह्मण-प्रतिपालक होते परंतु ब्राह्णांचा शिरजोरपणा मान्य करणारे नव्हते. श्रीशिवाजी महाराजांची चरित्रे आजवर बरीच झाली; परंतु या अननुभूत राष्ट्रवीराच्या चारित्र्याचे मर्म महाराष्ट्राने अजून पूर्णपणे जाणलेले नाही. हे मर्म ज्या दिवशी महाराष्ट्राला नीट उमगेल, त्या दिवशीच त्याचा भाग्योदय होईल. या मर्माची ओळख पटवून देणा-या `राष्ट्रवीर’ साप्ताहिक पत्राचा आज श्रीशिवरायाच्या जन्मदिवशीच जन्म होत आहे, याबद्दल त्याचेकोणीही राष्ट्राभिमानी अभिनंदनच करील, या राष्ट्रवीराच्या पहिल्या अंकांत माझ्या सारख्या दुबळ्या सेवकाची वेडीवाकडी सेवा अवश्य रूजू झाली पाहिजे, असा निकडीचा विद्युसंदेश आल्यामुळे तात्कालिक भावनेचे हे अक्षरशः वेडेवाकडे विचार-व्यक्तीकरण राष्ट्रवीराच्या चरणी अर्पण करून, सध्या वाचकांची मी रजा घेतो. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, परि त्या शिवराये बोलविले!!!
[राष्ट्रवीर, ९-५-२१]
लेख ३
बुद्धदेवाची कामगिरी
बरोबर २५११ वर्षे झाली. वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस. हिंदू राष्ट्राच्या चरित्रातला एक परम मंगल, स्फूर्तिदायक आणि अभिमानोत्तेजक दिवस होय. अडीच हजार वर्षांपूर्वी याच दिवशी हिंदु राष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक, नैतिक व राजकीय जीवनात आत्मतेजाचे चैतन्य ओतून प्रबोधनाचे अननुभूत चळवळ निर्माण करणारा महात्मा गौतमबुद्ध बुद्धदेव म्हणून जगद्रंगभूमीवर येऊन उभा ठाकला. या दिवशी सर्व जगभर ठिकठिकाणी बुद्धानुयायी बांधव बुद्धदेवाचे भजनपूजन करण्यासाठी एकत्र होतात व त्याने निर्माण केलेल्या विश्वव्यापी प्रबोधनाच्या दिव्य कामगिरीचे मुमुक्षु वृत्तीने चिंतन करतात. वास्तवीक, बुद्धदेव आम्हा हिंदूंचा. हिंदू धर्मात मिशनरी चैतन्य ओतून त्याला सा-या जगाचा जगद्गुरु केले बुद्धदेवांनी. आज नाही नाही तरी जगाच्या पाठीवर पन्नासकोटींच्या वर बुद्धानुयायी भगिनी बांधव दररोज `नमो बुद्धाय’ म्हणून बुद्धदेवाला प्रणिपात करीत असतात. असे असता, हिंदुस्थानचा बुद्धदेव की बुद्धदेवाचा हिंदुस्थान, हा सोपा प्रश्न सुद्धा हिंदू म्हणविणारांना कधी सुचू नये, हे कालमाहात्म्य होय. परंतु या कालमाहात्म्यावर विचारशक्तीची मात करून बुद्धदेवाच्या कामगिरीची कृतघ्न हिंदुस्थानाला आठवण देण्याचा उपक्रम यंदा मुंबईच्या काही विचारी सज्जनांनी ता. १०-५-२२ रोजी बुद्धजयंती साजरी करून केला, याबद्दल प्रबोधन त्या सर्व सज्जनांच्या चरणी साष्टांग प्रणिपात घालीत आहे. गेल्या जयंतीचा विशेष हा होता की बुद्धदेवाचे स्मरण करण्यासाठी जमलेल्या मंडळींत अनेक पक्षांचे, अनेक मतांचे आणि अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी एकाच भावनेने एकत्र झाले होते. भेदांतच अभेद हे जे बुद्धदेवाच्या कामगिरीचे रहस्य ते या ठिकाणी यदृच्छेने प्रत्यक्ष व्यक्त झालेले दिसले. जपान राष्ट्राचे दरबारी वकीलसाहेब आपल्या पत्नीसह हजर होते. सारांश, पृथ्वीवरील निरनिराळी राष्ट्रे एकजीव होण्याचा संभव जितका बुद्धदेवाच्या चरित्ररहस्यात आहे, तितका श्रीकृष्णाच्या नाही आणि क्रिस्ताच्या तर नाहीच नाही, हे लक्षात येईल. बुद्धदेवांनी आपल्या कामगिरीचे क्षेत्र हिंदुस्थानापुरतेच आकुंचित ठेविले नाही. त्यांनी सर्व भेदांचा पूर्ण संन्यास करून हिंदुस्थानाची कोंडी फोडली आणि
एतद्देशप्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः ।
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्वमानवाः ।।
या व्यापक धोरणाने त्यांनी सा-या जगाला `आपले’ केले. प्रस्तुत जयंतीचा उपक्रम असाच दरसाल नियमित होईल आणि त्याबरोबरच बुद्धदेवाच्या संप्रदायाचा इतिहास अध्ययन करण्याची अभिरुची तरुणतरुणीत बळात जाईल, तर हिंदुंच्या प्राणत्राणपरायण विविध चळवळीत लुप्त झालेले मिशनरी चैतन्य खात्रीने पुनश्च थरारल्याविना राहणार नाही.
सांप्रत हिंदुराष्ट्र पुनरुज्जीवनाच्या संक्रमणावस्थेत आहे. त्याचे सामाजिक व धार्मिक जीवन सडलेले असून, राजकीय बाबतीत ते गुलाम बनलेले आहे. अनेक मतांतरांचा सर्वत्र गोंधळ माजल्यामुळे विवेकवादाची बीजे रुजविण्याचेकार्य कठीण होऊन बसले आहे. अनेक शतकांच्या भिक्षुकशाही वर्चस्वामुळे सारी जनता अक्षरशत्रू राहिली आहे आणि त्यांच्या अज्ञानावर चरणा-या भिक्षुकी पोळांनी तिच्यात धर्मांच्या नावावर मानसिक दास्याचे जहर फैलावून आपल्या वर्चस्वाची कडेकोट तटबंदी केलेली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या सध्या चालू असलेल्या नानाविध चळवळी एकपक्षी, एकांगी व एकाक्ष असल्यामुळे, मूढ जनतेच्या जागृतीने उत्पन्न झालेला दास्यविरोधी ज्वालामुखी त्या चळवळींना ठिकठिकाणी विरोधाच्या ज्वाळांनी अडवून धरीत आहे. अशा प्रसंगी हिंदु राष्ट्राला बुद्धदेवाचे विस्मरण होताच कामा नये. ज्या बुद्धदेवाने एक वेळ याच भरतखंडाला असल्याच परिस्थितीत तारले व सा-या दुनियेचा सम्राट बनविले, तो बुद्धदेवच आता हिंदू राष्ट्राच्या धुरेवर येऊन उभा राहिला पाहिजे.
बुद्धपूर्वकाली हिंदुराष्ट्राची जी स्थिती होती तीत आणि आताच्या स्थितीत रूपभिन्नतेपेक्षा कसलाही फरक नाही. भिक्षुकशाहीचे बंड आताप्रमाणेच त्या वेळी फार शिरजोर झाले होते. धर्माच्या नावाखाली वाटेल तसले अत्याचार करण्यास ब्राह्मण लोक पक्के निर्ढावलेले होते. क्षत्रिय, वैश्यांच्या तेजोभंग करून, त्यांना सर्व बाबतीत ब्राह्मणांचे गुलाम बनविण्याचे भिक्षुकी कारस्थान त्यावेळी पूर्ण यशस्वी झाले होते. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रांतच केवळ नव्हे, तर राजकीय क्षेत्रांतही, ब्राह्मण आपल्या भूदेवत्वाच्या सबबीवर श्रक्षियांना खेटराप्रमाणे लेखू लागले होते. खुद्द क्षत्रिय, वैश्यांची जेथे ही स्थिती, तेथे गरीब बिचा-या शूद्रांची व अस्पृश्य जनांची काय बडदास्त ब्राह्मणांनी ठेविली असेल, याची कल्पना आम्ही करून दिलीच पाहिजे असे नव्हे. सर्वच बाबतीत भिक्षुकशाही शिरजोर झाल्यामुळे ब्राह्मणेतरांच्या नशिबाला शारीरिक व मानसिक गुलामगिरीपेक्षा दुसरे काय येणार? ब्राह्मण म्हणजे भूदेव, ब्राह्मण जात म्हणजे राष्ट्र, त्यांच्या ब-यावाईट स्वार्थी आत्मस्तोमाच्या चळवळी म्हणजे राष्ट्रीय चळवळी, आणि ब्राह्मणेतर जनता, तिच्या आकांक्षा, तिचे हक्क इत्यादी प्रकार म्हणजे ब्राह्मणांच्या पायातली पायतणे, या वर्तमान भिक्षुकशाही कल्पनेचा राक्षसी धागा थेट बुद्धपूर्वकालीन इतिहासापर्यंत बिनतोड जाऊन भिडलेला आढळतो. धर्माच्या क्षेत्रातल्या भिक्षुकी वर्चस्वाच्या कल्पना हुबेहूब मनुस्मृति टायपाच्या. मंत्रतंत्राचे बंड बेसुमार माजलेले. सर्व जग देवाच्या स्वाधीन, देव मंत्रांच्या आधीन, मंत्र ब्राह्मणांच्या स्वाधीन, म्हणून जेहत्त ब्राह्मण हे भूदेव होत, ही जी मनुस्मृतीची भिक्षुकी घमेंड आजचेही ब्राह्मण निःशंकपणे मारण्यास शरमत नाहीत, तिची अक्षरशः अंमलबजावणी त्या वेळी ब्राह्मणेतरांवर ब्राह्मण गाजवीत असत. आताप्रमाणेच त्या काळी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रादि जाती जन्माच्या अपघातावरूनच ठरविण्यात येत असत. खुद्द ब्राह्मणांची दिनचर्या पाहिली तरी मंत्रवेत्तेपणाची व मंत्ररक्षणार्थ लागणा-या आत्मशुद्धीची जरी ते तोंडी वल्गना पष्कळ करीत, तरी त्यांचे आचारविचार आताच्या नामधारी ब्राह्मणांइतकेच क्षुद्र व निकृष्ट असत. तथापि बहुजनसमाज आताप्रमाणेच निरक्षर, मूढ व भोळसट असल्यामुळे, त्याची मनोवृत्ती अंधश्रद्धेची धूळ फेकून आंधळी करणे तत्कालीन भूदेवांना फारसे कठीण गेले नाही. उलट या अंधश्रद्धेच्य जोरावर ब्राह्मणेतरांना मंत्रतंत्रांच्या यंत्रांत सफाई पिळून त्यांची चिपाडे करण्याची कामगिरी ब्राह्मण भूदेव दिवसाढवळ्या करीत असत. मंत्रतंत्राच्या जोडीला दुसरे एक शस्त्र ब्राह्मणांनी हस्तगत करून ठेवले होते. ते म्हणजे दैवी शक्ती मिळविण्यासाठी यज्ञयाग करणे हे होय. यज्ञयागाने देव संतुष्ट होतात व माणसांच्या दैवाच्या उलट्या कवट्या सुलट्या बसवितात ही आर्य लोकांची कल्पना वेदकाळापासूनची आहे. तिचा पोकळपणा हडसून खडसून सिद्ध झाला असून, पुत्रासाठी कामेष्टी यज्ञ करणारे भाट्ये आणि जर्मनीचा नायनाट होण्यासाठी फणसवाडीत खंडोगणती तूप जाळणारे हरेश्वर महादेव पंडित, असले यज्ञयागप्राण्याचे भक्त अजूनसुद्धा बरेच आढळतात; मग तुळशीची हजार पाने सत्यनारायणारा वाहून, किंवा शेंदराच्या पट्ट्याने धोंड्यात उद्भवलेल्या म्हसोबाला कोंबड्या बक-यांचा नैवेद्य दाखवून भरभराटीची फलश्रुति मागणारे लोक कितीतरी असतील! असो, अनेक शतकांच्या प्रघातामुळे पशुहत्येचे निरनिराळे यज्ञ यशासांग करणे, ही एक त्यावेळी मोठ्या कुशलतेची कला होऊन बसली होती व ती सफीत वठविण्याची गुरुकिल्ली आपल्या हातीच ठेवण्यासाठी ब्राह्मणांनी दाखविलेली धूर्तता त्यांच्या लौकिकाला शोभेशीच होती. हल्ली जसे बारसे असो, बारावे असो, मुंज असो, लग्न असो, नाहीतर स्मशानक्रिया असो, तेथे भट हा पाहिजेच, तसेच त्याकाळी यज्ञ म्हटला की भटाची पायधरणी केल्याशिवाय गत्यंतरच नसे. मग हा भट नुसत्या कवाइत्या असला तरी त्याची आताप्रमाणेच कोणी खंत मानीत नसत. यज्ञात कोणत्या पशुंची किती हत्या करावी, याज्ञिकाने सोमदारूचे किती बुधले फडशा पाडावे, कोणत्या यज्ञात यजमानाकडून किती दक्षिणा हबकावी, इत्यादी मामले शुद्ध `वेदोक्त’ असल्यामुळे भट सांगेल ती पूर्व दिशा असा प्रकार सर्वत्र असे.
मंत्रतंत्राप्रमाणेच यज्ञयागांच्या बाबतीत तत्कालीन भिक्षुकशाहीचे वर्तन इतके रानटी, राक्षसी व रुधिरप्रिय होते की त्याची वर्णने वाचून कसाईखान्यातल्या खाटकांच्या हृदयालासुद्धा द्रव आल्याविना राहणार नाही. मंत्रतंत्र, उपासतापास, यज्ञयाग इत्यादिकांत होणा-या अत्याचारांनीच त्यांची विफलता ब-याच विवेकी लोकांना त्या वेळीसुद्धा पटली होती व ते त्याविरुद्ध निषेधाचा पुष्कळ जळफळाटही करीत. परंतु भिक्षुकशाहीने `सार्वत्रिक’ केलेल्या, कित्येक शतकांच्या प्रघाताने रुढिमान्य झालेल्या, बहुजनसमाजाच्या नित्य आचरणाने आंगवळणी पडून `लोकमान्य’ बनलेल्या धर्मकल्पना किंवा सामाजिक चालीरीती कितीही बाष्कळ व निरर्थक वाटल्या तरी त्याविरुद्ध सक्रीय प्रतिकाराची चढाई करण्याचे धारिष्ट कोणासही होईना. हल्लीसुद्धा विधवाकेशवपनासारखी घाणेरडी चाल अविचारी व अनीतिची आहे, हे पटलेले असूनसुद्धा, वेळ येताच चांगले शहाणेसुर्ते त्या रूढीला मान देतातच ना? एखाद्य पातकाची नुसती जाणीव होऊन भागत नसते, तर त्याला बेदम चोपून जिवंत गाडण्यितका आत्मविश्वासाचा जोर निषेधकाच्या मनगटात असावा लागतो. तथापि गुपचूप निषेधाची शक्ती अगदीच काही वाया जात नाही. एखाद्या जुलमाविरुद्ध उघडउघड बंड झालेले पुरवले, कारण त्याचा मोक्ष तडकाफडकी लावता तरी येतो; पण गुप्त असंतोष जर का जनतेच्या हृदयात घर करू लागला, तर त्याच्या आकस्मिक स्फोटाने ब्रह्मांडाचेही राईराई एवढे तुकडे होतात. भिक्षुकशाहीने धर्माला अट्टल दारूबाज, मांसाहारी व अत्याचारी बनविल्यामुळे उत्पन्न झालेल्या गुप्त असंतोषाच्या स्पोटांतून बुद्धदेवाचा अवतार झाला आणि त्याने आत्मसंशोधित नवमतवादाच्या एकाच मुसंडीने भिक्षुकशाहीचा मुर्दा पाडला.
नवमतवादाच्या इतिहात एकगगोट विशेष स्पष्ट आढळून येते की, जेव्हा जेव्हा जनेला भिक्षुकशाही दास्यांतून मुक्त करण्याचे पर्संग आले, तेव्हा तेव्हा क्षत्रिय वीरच पुढे सरसावलेले दिसतात. धर्मस्थापना घ्या, सामाजिक पुनर्घटन घ्या किंवा राजकीय स्वातंत्र्य घ्या, क्षत्रियांची उडी त्यात पडल्याशिवाय ते कार्य यशस्वी झाल्याचा दाखला नाही. शिवाय ब्राह्मणातील उत्तम पुरुषांची कार्ये आणि क्षत्रिय वीरांची कार्ये यात एवढा भेद असतो की पहिला जात्याच संकुचित मनोवृत्तीचा असल्यामुळे त्याच्या कार्याचा व्याप शंकराचार्यांच्या संप्रदायाप्रमाणे गावठाण्याच्या कुंपणाइतकाच असतो आणि क्षत्रियाची मनोवृत्ती त्याच्य महत्त्वाकांक्षेप्रमाणे मोकाट दिलदार असल्यामुळे त्याच्या कार्याची पकड महात्मा बुद्धदेवाप्रमाणे सा-या पृथ्वीला कवटाळते. ब्राह्मणांचे वाचीवीर्यत्व आणि क्षत्रियांचे सव्यसाची धनुर्धारित्व इतिहासप्रसिद्ध आहे. धर्मस्थापना करावी क्षत्रियांनी आणि तिचा विध्वंस करण्याच पुण्य मात्र मिळवावे ब्राह्मणांनी. क्षत्रियांनी स्वराज्य कमवावे आणि ब्राह्मणांनी ते गमवावे, हा अनुभव तर अगदी कालपरवाचा; मात्र परंपरा फार प्राचीन काळची.
गौतम बुद्धाच्या चरित्रात असा एक विशेष आहे की त्याला जगाच्या इतिहासातच दुसरी तोड नाही. एकूणएक तत्त्ववेत्त्यांची प्रवृत्ती तत्त्वशोधनाकडे वळविण्यास त्यांची आपत्ती कारण झालेली आढळते; पण गौतम बुद्ध राज्यवैभवाच्या उत्कृष्ट उत्कृष्ट सुखोपभोगात गुलाबाच्या फुलाप्रमाणे झेलला जात असता आजूबाजूला पसरलेल्या जगाच्या दुःखाने विव्हळ झाला आणि तत्त्वशोधनाकडे वळला. जगाच्या दुःखासाठी स्वतःच्या सुखावर निखारे ठेवणारा देवाचा अवतार मानण्यापेक्षा प्रत्यक्ष देवच का मानू नये? राजपुत्र असताना त्याने स्वधर्माचे शक्य तेवढे शिक्षण भिक्षुकशाही विद्वानांपासून मिळविलेच होते. पुढे सर्वसंगपरित्याग केल्यानंतर त्ये तत्कालीन पंडितांपाशी तत्त्वज्ञान व योग यांचेही ज्ञान मिळविले; परंतु त्याच काही समाधान झाले नाही व ज्या दुःस्थितीचे उच्चाटन करण्यासाठी त्याने एवढा आत्मयज्ञ केला, ते साधन तर त्याला हस्तगत होण्याची मुळीच आशा दिसेना! अखेर पंडितांच्या पोपटपंची परंपरेला आणि देह विनाकारण झिजवून आत्मज्ञानाची आशा लावणा-या हटयोगाच्या हट्टाला त्याने लाथाडून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निश्चय केला. अर्थात आत्मसामर्थ्याचा जोर उत्पन्न होताच त्याला गयेस आत्मसाक्षात्काराचा अनुभव येऊन, त्याच्या नवमतवादाची योजना सिद्ध झाली व आत्मविश्वासाच्या बळावर या योजनेची मात्रा जगाच्या दुःखावर देण्याचा त्याने कृतसंकल्प केला.
बुद्धदेवाच्या संप्रदायाची तत्त्वे काय होती व त्याने त्यांच्या जोरावर रुधिरप्रिय व दास्यप्रवर्तक भिक्षुकशाहीच्या कचाट्यातून आर्यधर्माचा बचाव कसा केला, याची विस्तृत माहिती येथे देणे शक्य नाही. परंतु इतके म्हटले पाहिजे की भूतदयेच्या भांडवलावर आणि सुरुवातीला फक्त पाच अनुयायी मिळवून बुद्धदेवाने आपल्या नवमतवादाचा प्रसार एवढा जबरदस्त केला की वादविवादाची एकही सरबत्ती न झाडता, त्याने थोड्या वर्षांतच भिक्षुकशाहीला चीं चीं करायला लावले. त्याने आपल्या संघाचे दरवाजे आब्राह्मणचाण्डाळांना मोकळे सोडून मानवजातीचा अभेदभावाचा एक विश्वव्यापक भ्रातृसंघ तयार केला. सर्वांना आत्मज्ञानाची मुबलक खैरात समसमान झाल्यामुळे श्रेष्ठकनिष्ठ, उच्चनीच, स्पृश्यास्पृश्य या भेदांना तात्काळ गति मिळाली व आर्यधर्माचे खरे विशुद्ध, लोकसंग्रही व उदात्त स्वरूप जगाच्या निदर्शनात आले. बौद्धधर्म हा आजला जरी निराळा धर्मपंथ असा आपणास भासतो तरी बुद्धदेवाने निराळा धर्म मुळीच काढला नाही. जुन्या धर्मावर चढलेले कुविचारांचे कीट काढून टाकले मात्र. म्हणजे बौद्धधर्म हा सुधारलेला हिंदुधर्म होय. बुद्धदेवाच्या उदार क्षत्रियवृत्तीचे त्याच्या आत्यंतिक भूतदयेत उत्तम मिश्रण झाल्यामुळे, त्याच्या संघाची तत्त्वे क्षत्रिय लोकांना तात्काळ मानवली व ते भराभर त्याचे अनुयायी झाले. वैश्यांचाही हाच प्रकार. बिचा-या शूद्रांचा व अस्पृश्यांचा आनंद काय विचारावा! त्यांना बुद्धदेव ईश्वरापेक्षाही प्रिय वाटला. क्षत्रियादी त्रैवर्णिकच बुद्धाचे अनुयायी झाले असे नव्हे, तर धर्माच्या नावाखाली होणा-या भिक्षुकशाहीच्या अत्याचारांस विटलेले आणि युद्धाचा विवेकवाद विचारान्ती पटलेले हजारो ब्राह्मणसुद्धा अखेर बुद्ध जगद्गुरुचा संघात सामील झाले. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्यांना धर्म फक्त आर्यांकरिता, इतरांकरिता नव्हे, ही जी संकुचितपणाची कोंडी भिक्षुकशाहीने निर्माण केली होती, ती कोंडी फोडून पृथ्वीवर वाटेल त्या राष्ट्रांतला, वाटेल त्या संस्कृतीचा मनुष्य, त्याची इच्छा असेल तर, आपल्या संघात बिनतक्रार समाविष्ट करून घेण्याचा मिशनरी उपक्रम प्रथम बुद्धदेवाने चालू केला आणि लोकसंग्रहाच्या या तत्त्वांच्या जोरावर पुढे त्याच्या एकनिष्ठ अनुयायांनी सारी उपलब्ध दुनिया पादाक्रान्त केली.
बुद्धदेवाच्या चळवळीला धार्मिक बंड म्हणण्यापेक्षा सामाजिक बंड हेच नाव अधिक शोभते. त्याने वेदप्रणीत धर्मतत्त्वांचा निषेध केला नाही, तर त्यांचा खरा अर्थ काय आहे तो जनतेला उघड करून दाखविला. यज्ञयागांचा खरा अर्थही त्याने शिकविला. स्वतः प्रबुद्ध राजपुरुष असल्यामुळे, बुद्धदेवाच्या उपदेशात राजकारणाची दूरदृष्टी तर विशेष चमकत होती. बुद्धदेवाच्या नवमतवादी प्रचंड चळवळीने भिक्षुकशाहीचे वर्चस्व सर्वस्वी जमीनदोस्त झाले व त्यामुळे बुद्धदेवावर भिक्षुकशाही जळफळाट करू लागली, हे खरे; परंतु ज्या वेदप्रणीत धर्माच्या प्रतिनिधत्वाची ऐट भिक्षुकशाही मारीत असे त्याच धर्माचे शुद्ध स्वरूप बुद्धदेवाने सर्वत्र प्रसृत केल्यामुळे ब्राह्मणांना आपली बाजू सावरता सावरता नकोसे झाले. बुद्धदेवाने वेदप्रणीत कल्पनांच्या आधारावर आर्यसंघाची व्यापक धोरणावर पुनर्घटना केली आणि कालमानाला अनुसरून धर्माचे द्वार सर्वांना अभेदभावाने मुक्त सोडले. शुद्ध आचारविचारांची महती धर्माप्रमाणे राजकारणाच्या क्षेत्रांत त्याने विशेष प्रतिपादन केल्यामुळे राष्ट्राच्या जीवनात अध्यात्माच्या जोडीने अर्थवादही थरथरला. तत्त्वज्ञानाच्या शुष्क अवडंबरापेक्षा त्याचा प्रत्यक्ष उपयोग राष्ट्राच्या चारित्र्यात केल्यामुळे राष्ट्राच्या भाग्योदयाचा प्रवास भराभर होत गेला.
बुद्धदेव आमचे आहेत. त्यांची धर्मतत्त्वे आमची आहेत. कालविपर्यासामुळे आम्ही आजवर बुद्धदेवाला विसरलो होतो. आज त्यांची आम्हाला आठवण झाली. हिंदुस्थान बुद्धदेवांचा आहे, बुद्धदेव हिंदुस्थानचे आहेत. ते हिंदू राष्ट्राला कसे विसरतील? आपल्या एकदेशियत्वाची कोंडी फोडून हिंदुस्थान आशिया खंडातील बुद्धानुयायी राष्ट्रांशी सहकारिता करील तर, `एशियन्स नेशन्स लीग’सारख्या प्रचंड पराक्रमी संघ निर्माण होऊन त्याच्या द्वारे बुद्धदेवांची मिशनरी चळवळ सा-या जगाला पुन्श्च पादाक्रांत करून हिंदू धर्माला जगाचे जगद्गुरुपद प्राप्त व्हायला उशीर लागणार नाही. बुद्धदेवा, लवकर या.
[प्रबोधन १-६-२२]
लेख ४
शिवरायास आठवावे
आज श्रीशिवरायाचा जन्मदिवस. आम्हा मराठ्यांचा अत्यंत मंगळ दिवस. सायन निरयण पंचागवादाच्या धुमश्चक्रीत हिंदूचे सगळे सण जरी फाल्गुन पौर्णिमेच्या होळीत जळून खाक जाले तरी खुशाल होऊ द्या, पण आम्ही मानी मराठे हा श्रीशिवाजयंतीचा सण आचंद्रार्क नष्ट होऊ देणार नाही. या सणात आमच्या प्रेमाचा आत्मा आहे. या मंगल दिवसांत आमच्या भूतकालच्या वैभवाप्रमाणेच भविष्यकालीन वैभवाचे मांगल्य बीजरूपाने धगधगत आहे. या पुण्य सणात आमच्या कलम-समशेर-बहाद्दर वाडवडिलांची पुण्याई नंदादिपाप्रमाणे अखंड तेवत असून, तिच्याच कालभेदी शोधनप्रकाशाच्या (सर्चलाइट) अनुरोधाने आम्हाला भविष्यकालचे महा-राष्ट्र निर्माण करावयाचे आहे. या जयंतीत आमच्या उद्यांच्या दिग्विजयाचा गुप्त संदेश साठविलेला आहे. आमच्या भाग्योदयाची किल्ली तेथेच आहे आणि गुलामगिरीतून स्वातंत्र्यात येण्याचा महारुद्राचा मंत्रही तेथेच आहे. म्हणूनच समर्थ आपल्या समर्थ वाणीत सांगतात की, शिवरायास आठवावे. त्या पुण्यश्लोकाचे स्मरण करावे. स्मरण? नुसत्या स्मरणाने काय होणार!
स्मरणाने काय होणार? काय वाटेल ते होईल. होत्याचे नव्हते होईल. स्मरणशक्ती ही एक अजब चीड आहे. मानवसृष्टीला परमेश्वराने बहाल केलेली दिव्य देणगी आहे. हिच्याच जोरावर साधुसंतांनी चिंतन करून परमेश्वराला बिनतोड हुडकून काढले. श्रीराम-कृष्ण-पांडवादिकांच्या पराक्रमाच्या स्मरणानेच बालशिवाजीची मनोभूमिका तयार झाली. त्यांच्या आपत्तींच्या चिंतनानेच तरुण शिवाजीचे हृदय तटबंदी बनले. त्यांच्या नैतिक सत्वाने शिवाजीचे बाहू फुरफुरले आणि `सत्यमेव जयते नानृतम्’ या रहस्याने त्याच्या भवानी समशेरीला पाणी चढून, तिने महाराष्ट्राच्या गुलामगिरीवर ऐश्वर्याची मिजास मारणा-या सुलतानशाहीला अखेर पाणी पाजले.
स्मरणशक्तीचा पराक्रम अगाध आहे. राष्ट्राच्या इतिहासाची ही माता. काळाचे कलम आत्मतेजाच्या शाईत बुडवून मानवसृष्टीच्या हृदयफलकावर त्यांच्या भल्या बु-या भवितव्यतेचे चित्र हीच देवता रेखाटीत असते. गुलामगिरीच्या रौरव नरकात किड्याप्रमाणे लोळण्यातच जीवितसार्थक मानणा-या माणसांना त्यांच्या पूर्वसंचिताचा दिव्य संदेश सांगून, स्वातंत्र्याच्या धवलगिरीला हां हां म्हणता सर करण्याची स्फूर्ति व सामर्थ्य देणारी बिजली हीच. भर दरबारात शिष्टजनांच्या डोळ्यांसमोर साध्वी द्रौपदीच्या विटंबनेचा सूड उगवल्याखेरीज त्रैलोक्याच्या साम्राज्य-सिंहासनाचाही स्वीकार करू नकोस, असला जळजळीत मंत्र पांडवांच्या कानात फुंकून, त्यांच्या इभ्रतीच्या मर्दानी रक्ताला रटरटा रहाळ्या मारण्यास लावणारी चैतन्यशक्ती हीच. विजयनगरच्या हिंदू बादशाहीच्या खुनाचा सूड उगविण्यासाठी दाताला दात आणि लाथेला लाथ हाणून, हिंदुचे हिंदवी स्वराज्य स्थापन केल्याशिवाय राहू नकोस; असा सत्याग्रही कानमंत्र शिवबालकाच्या कानात फुंकणारी राष्ट्रदेवता हीच. प्रतिकारी परिस्थितीच्या बेफाम ज्वाला आंगलट चाटू लागताच, `हां, शिवबा, घाबरू नकोस. ही छिनाल माया आहे. राष्ट्राचे रक्त शोषून गलेलठ्ठ बनलेली ही शूर्पणखा आहे. श्रीरामचंद्राचा इतिहास स्मरण कर, आणि बेटा, हूं चढव भवानीचा पट्टा न् जा तिच्या छाताडावर चाल करून.’ असा धीराचा इषारा ऐनवेळी देणारी प्रतापगडची भवानी ती हीच. शहाजीराजांना अटकेत ठेवून राजकारणाच्या व्यभिचारी आडाख्यात शिवबाचे नाक दाबून तोंड उघडण्याचे कारस्थान रचणा-या विजापूर दरबारच्या मिंध्या शेंदाड मराठ्यांच्या पेचावर, स्वराज्यासाठी कौटुंबिक माया-मोहाचा होम करून, उलट्या पेचाची मेख मारण्याची अक्कल शिवाजीला कोणी शिकवली? याच देवतेने. हिंदुंच्या प्राचीन वैभवाचा चित्रपट शिवाजीसारख्या आपल्या अनन्य भक्ताच्या डोळ्यांपुढे भरभर फिरवून, त्याच्या रोमारोमात हिंदवी स्वराज्यवैभवाची कल्पना बिजलीप्रमाणे सणाणत कोणी ठेविली? हिनेच. या राष्ट्रवीराने जिजामाउलीच्या पुण्योदरातून या लोकी आपल्या आगमनाची पहिलीच कोSहमची किंकाळी फोडताच, शिवनेरीच्या शिवाईच्या बेहोष तांडवनृत्याला प्राचीन इतिहासाच्या स्मरणदेवतेनेच आपल्या कालिकानौबदीच्या दणदणाटाची साथ देऊन `हिंदवी स्वराज्यकर्ता राष्ट्रवीर जन्माला आला. महाराष्ट्रा भिऊ नकोस. तुझा महात्मा अवतरला!’ असा सा-या त्रिभुवनात डंका पिटला.
अहाहा! श्रीशिवजयंतीचा केवढा तो महोत्सव. राष्ट्रवैभवाचे केवढे विश्वव्यापी विराट स्वरूप या दिवशी शिवनेरीवर संकलित झाले होते. स्मणशक्तीलाही मोजदाद करता त्रेधा उडाली, असे कितितरी असंख्य नरनारीजन या दिवशी शिवबालाचे दर्शन घेण्याकरिता शिवनेरीला जमले होते. नाना त-हेच्या कितीतरी वाद्यवाजंत्र्यांनी या दिवशी सारी चौखंड पृथ्वी दणाणून सोडली होती. बिचा-या जिजामाउलीला प्रत्येक पाहुण्याच्या प्रणिपाताला प्रतिप्रणिपात करता करता नकोनकोसे झाले होते आणि सवाष्णींनी भरलेल्या मंगल आहेरांच्या ओट्या देता घेता बिचारीचा प्राण कंठी आला होता. सारा शिवनेरी शिवभक्तांनी नुसता गजबजून गेला होता. पण या बेट्या बखरकारांची जबानी पहा. यांची डोकी व अंतःकरणे काय लाकडाची असतात की काय कोण जाणे! म्हणे `जिजाईला शहाजी राजांनी एकटी टाकल्यामुळे ती शिवनेरीच्या आश्रयाला गेली. तेथे ती बाळंत होऊन तिला शिवाजी नावाचा मुलगा झाला.’ झाSला यांचा इतिहास! थुःत् लेकाच्यानो तुमच्या जिनगानीवर. ही काय बखर, इतिहास, का तुमचे डोंबल? `शिवाजी जन्माला आला’ या उद्गारात केवढी शक्ती भरलेली आहे, याची जाणीव या बखरकारांना कोठली असणार! घडलेल्या गोष्टी शब्दांत मांडल्या की झाले यांचे काम. `शिवाजी जन्माला आला’ या उद्गारांत महाराष्ट्राचे भाग्य आहे. नवजीवन देवतेचा आत्मा आहे. महाराष्ट्रधर्माचा जिवंत अग्नि आहे. या उच्चाराची पारायणे करताच मूर्तिमंत शिवाजी महाराज आपल्यापुढे दत्त म्हणून उभे ठाकतील. जुन्यापुराण्या गोष्टी जाऊ द्या; या विसाव्या शतकात, ब्रिटिश रियासतीत, स्वराज्याच्या उषःकाळी, गुलामगिरीच्या आपत्तीचा जहरी प्याला काठोकाठ भरला असता, स्वातंत्र्याच्या जहानेने महाराष्ट्राचा घसा कोरडा पडला असता,
शिवाजी जन्माला आला
या बातमीचा मंत्र सह्याद्रीपासून विंध्याद्रीपर्यंत गोफणीच्या गोट्याप्रमाणे भिंगरीसरसा रोंरावत जाऊ द्या आणि पहा त्याचा काय परिणाम होतो तो! बखरकरांनो, खुद्द धारातीर्थी मरण पावलेल्या योद्ध्यांच्या रक्तात आपल्या बहाद्दर लेखण्या बुचकळून तुम्ही जरी मोठमोठ्या महायुद्धांचे इतिहास खरडलेत, तरी `शिवाजी’ या नुसत्या नामोच्चाराने राष्ट्रात जे शौर्यचैतन्य निर्माण होईल, त्याच्या कोट्यंशाने तुमच्या खरडेघाशीला ते साधणार नाही. `शिवाजी जन्माला आला’ हा मंत्रसंदेश महाराष्ट्राच्या, नव्हे, सबंध हिंदुस्थानच्या, वातावरणात घुमत घुमत जाऊ द्या-आता, आज, या विसाव्या शतकात, माँडफर्ड रिफॉर्म्सच्या युगात, खादीकाळात, गांधी महात्म्य हंगामात – भिंगरीप्रमाणे गुं गुं करीत जाऊ द्या, असा चमत्कार होईल की, `शिवाजी’ या शिव मंत्रापुढे तुमच्या त्या रिफ़र्म्सचे धुके वितळून जाईल; अत्याचार बरा की अनत्याचार बरा या वादाच्या किसण्या मसणाची वाट धरतील; खादी वापरून स्वराज्य मिळेल की गादीवर लोळतो लोळता अवचित ते उरावर येऊन बसेल, याचा काथ्याकूट करणारे चातुर्मासे पंडित भेदरून कोनाकोप-यात छपतील. `शिवाजी आला’ ही शिववार्ता कानी पडताच आमच्या गोमाता कान टवकारून स्वागताचा हंबरा फोडीत, शिवाजी कोठून येतो हे पाहण्यासाठी दाही दिशांकडे काव-याबव-या पाहू लागतील. महाराष्ट्रातल्या पडीत किल्ल्यांचे बुरुज आपल्या प्राणांचा प्राण पुन्हा येणार म्हणून आकाशाला भिडे इतकी आपली मान उंच करतील. ब्रिटीश रियासतीच्या सुधारलेल्या अमदानीत अन्नपाण्याला मोताद होऊन पाठीला पोट लागलेल्या शेतक-यांच्या कच्च्याबच्च्यांतून तानाजी, नेताजी, येसाजी निर्माण होतील. भिक्षुकशाहीने शूद्र ठरविलेल्या मराठ्यांचा क्षत्रिय बाणा भिक्षुकशाहीला नेस्तनाबूद करून सा-या हिंदुस्थखानाला पुरून उरेल. राष्ट्रीय गुंडांच्या स्वार्थी खटपटीच्या उकिरड्याखाली गाडलेल्या महाराष्ट्रधर्माच्या स्फुल्लिंग पुनश्च धुमसू लागेल. त्याच्या प्रज्वलित ज्वालांनी नामधारी देशभक्तांच्या धांगडधिंग्यांची राखरांगोळी होऊन, दांभिक राजकारणी धर्ममार्तंडांच्या शिरजोरपणाच्या ठिक-या ठिक-या उडतील. शिवाजी आला, आता महाराष्ट्रधर्माचा प्रतापसूर्य हिंदुस्थानावर पुनश्च प्रखर तळपू लागणार, या नुसत्या कल्पनेनेच आकाशातल्या बापाच्या एकुलत्या एका पोराने निर्माण केलेला `कुरुस’ बर्फाप्रमाणे वितळू लागले आणि तरवारीच्या जोरावर मोक्षप्राप्तीचा सौदा सवंग करणा-या इस्लामाच्या चांदता-याला अमावास्येची धडकी भरेल. या कविकल्पना नव्हत.
ही इतिहासाची छातीठोक जबानी आहे. बखरकारांनो, `शिवाज आला’ हा मंत्र बोलताना किंवा लिहिताना त्याच्या परिणामाचा नीट विचार करीत जा. काय म्हणता? शिवजन्माच्या वेळी शिवनेरीवर शिवजयंतीचा काहीही थाटमाट उडाला नाही? तुम्ही आंधळे आहात. माता जिजाईचे सुवीणपण करायला खुद्द महाराष्ट्राची नियतिदेवी तेथे हजर होती. हातीपायी सुटका होताच बाळबाळंतिणीला पंचारती ओवाळण्याचा मान पांडवपत्नी देवी द्रौपदीने मिळविला. बाल शिवाजीचे नाळवार कापण्याचे पुण्यकर्म श्रीरामाच्या कौसल्या मातेने केले व मुलाच्या जिव्हेवर अमृताचे बिंदु घालण्याचे कार्य प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवंताने केले. पुत्रजन्माच्या घटकेला शहाजी राजे हजर नसल्यामुळे लौकिकी तोफांची सरबत्ती जरी झडली नाही, तरी महाराष्ट्राचा स्वातंत्र्यरवि शिवनेरीच्या क्षितिजावर उदयोन्मुख होताच, सह्याद्रीच्या कोट्यवधी कडेकपाटांनी टाळ्यांचा एकच कडकडाट करून त्रिभुवनाच्या कानठळ्या बसवून टाकिल्या आणि त्या कडकडाटातून उत्पन्न झालेल्या प्रभंजनाने सा-या महाराष्ट्राच्या अणुरेणूत नवचैतन्याचा फुंकर घालून जिवंत करण्याची कामगिरी मोठ्या सोसाट्यात बजावली. जड सृष्टीत वावरणा-या व जड सृष्टीतील उलाढालीचेच निरूपण करणा-या बखरकरांना, अचेतन घडामोडींच्या पडद्यामागे धमधमणा-या चैतन्याची कल्पना होणार ती कशी!!
शिवरायास आठवावे! होय. आठवावे म्हणजे काय? नुसते नामस्मरण करावे? शिव शिव शिव शिव किंवा शिवाजी शिवाजी म्हणून गोमुखीत हात घालून माळ ओढायची काय नव्हे, स्मरणाचा हा मार्ग खोटा आहे. ढोंगी आहे. माळेचे मणी ओढून आजपर्यंत एकही प्राणी मोक्षाला समर्थ झाला नाही. शिवाजीचे स्मरण नीट पद्धतशीर झाले की स्वराज्य आपल्या मुठीत आले, हीच त्याची साक्ष व तोच त्याचा दृष्टांत. शिवरायास का आठवावे? स्वराज्य पाहिजे असेल, स्वातंत्र्य हवे असेल, राष्ट्रीय इभ्रतीचे माहात्म्य पवित्र राखण्याची इच्छा असेल, तर शिवरायास आठवावे. परंतु समर्थांच्या या सूत्राबरोबरच दुसरे एक सूत्र आहे. ते विसरून चालणार नाही. शिवरायास आठवावे. आणि पुढे काय? जीवित तृणवत् मानावे. हां, येथे मात्र खरी ग्यानोबाची मेख आहे. शिवस्मरण फलदायी केव्हा होईल? जेव्हा स्वराज्यासाठी शिवभक्त आपल्या जीवितावरसुद्धा तुळशीपत्र ठेवण्यास सिद्ध होतील तेव्हा; एरवी नाही. शिवाजीचे अभिमानी भक्त मुबलक सापडतील. शिवाजीचे परमेश्वरवत् भजनपूजन करणारे भक्त हजारो आढळतील. शिवाजीच्या पुण्य नावाचा उपमर्द करणा-याचा कण्ठनाळ दातांनी काडकन् फोडणारे जवानमर्द बरेच असतील. शिवाजी जातीचा मराठा म्हणून आज सर्व जातमात्र मराठे शिवरायाच्या नामस्मरणाने बेहोष होऊन नाचू लागतील. शिवरायाच्या हिंदवी स्वराज्याच्या पायात अनेक कायस्थ प्रभु नरनारींनी आपल्या प्राणांच्या आहुत्या दिल्या, म्हणून इतिहास वाचल्याची चुकती माकती पुण्याई कमविलेले काही कायस्थ (ऐन वेळी स्मरणशक्तीने दगा दिला नाहीच तर) क्षणमात्र वाडवडिलांचे गुण सांगून आपले पढतमौख्य व्यक्त करतील. परंतु आज घटकेला शिवरायाच्या हिंदवी स्वराज्याच्या कल्पनेबरहुकूम स्वराज्य निर्माण करणारे कितीक तानाजी आणि नेताजी मराठा जातीतून पुढे येतात? किती दादजी बाळजी आणि बाजी कायस्थात उत्पन्न होतात? प्रश्न सोपा आहे, उत्तर मात्र बिकट आहे. ज्या दोनच साम्राज्यांच्या रक्ताच्या सिमेंटावर शिवरायाने आपल्या हिंदवी स्वराज्याची त्रिखंडव्यापी इमारत बोलबोलता उठविली, ते कायस्थ, मराठा समाज आज कोणत्या स्थितीत आहेत? दोघेही कर्मन्यायाने मानसिक दास्यात इडकलेले आहेत. शिवपूर्वकाली ते मुसलमानांच्या राजकीय गुलामगिरीत कुजत होते. ते निरनिराळ्या शाह्यांच्या सुलतानी नोकरीवर मिळणा-या हाडकांवर बहोत खुष राहणारे नोकरमाने कुत्रे होते. परंतु त्यांचे मन मेलेले नव्हते. म्हणूनच शिवाजीचा स्वराज्यस्थापनेचा कर्णा कानी पडताच ते मधमाशांच्या झुंडीप्रमाणे भराभर धावत आले. परंतु आजला हे दोनही समाज मन मेल्यामुळे असून नसून सारखे झाले आहेत. पैकी मराठा समाजाच्या खुरटलेल्या खोडाला नव्या मनुतील मराठ्यांची पालवी तरी फुटत आहे; बाजीप्रभू देशपांड्यांच्या कायस्थ समाजाची अवनति अजून पूर्ण झालेली नाही. म्हणून तो जिवंत असूनही मेल्याप्रमाणे थंडगार पडलेला आहे. आमचे रक्त जिवंत असता, आमचे ओज शाबूत असता, आम्ही अवचित भिक्षुकशाहीच्या पायातली पायतणे का झालो?
आमच्या इतिहाससिद्ध स्वाभिमानाची, आमच्या स्वयंसिद्ध माणुसकीची मुंडी कोणी मुरगाळली? याचा शोध मराठ्यांना लवकरच लागला. कायस्थांचे मुळी डोकेच ठिकाणार नाही, तर त्यांना मुंडी मुरगाळल्याची दाद कोठली? ते बिचारे आपल्याच पढतमूर्ख स्वानंद साम्राज्यात गर्क आहेत. इंग्रजी नोकरशाही त्यांची देवता, हे तिचे भगत आणि भिक्षुकशाही त्यांना मोक्षाला बिनचूक ठेपी नेऊन पोहोचविणारी सॅल्वेशन एजन्सी! खलास. यापुढे कशाला हव्यात त्यांना त्या स्वराज्याच्या उठाठेवी? `राजकीय’ एवढा शब्द कानी पडताच ज्या कायस्थ समाजातील मोठमोठे महावीर फेफरे आल्याप्रमाणे करतात, त्यासमाजाकडून महाराष्ट्रा, तुला कसली अपेक्षा? शिवाजीसाठी-महाराष्ट्रासाठी-महाराष्ट्रधर्मासाठी-दीनदुनियेसाठी आपल्या देहाची पालखी करणारा, आपल्या रक्ताच्या पायघड्या घालणारा तो कायस्थ समाज रंगो बापूजी देशपांयाच्या मृत्यूबरोबरच मेला. आज सेन्सस पटात दिसणारा कायस्थ समाज, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, असल्या कमअस्सल कल्पनेच्या राजनिष्ठेत श्वानाचे जिणे जगवून दिवस कंठीत आहे. महाराष्ट्राच्या उद्धाराचेकार्य मराठ्यांनो! आता तुमच्या एकट्यावरच पडले आहे. भिक्षुकशाहीच्या बंडाला जमीनदोस्त करून, श्रीशाहू छत्रपती करवीरकरांच्या छत्राखाली नवयुगातील शिवाजीचे हिंदवी स्वराज्य उभारण्याचे कार्य करण्याचे पुण्य मराठ्यांनो, आता तुम्हीच मिळवा.
यासाठी शिवरायास आठवावें। जीवित तृणवत् मानावें. दीनदुनियेचा कैवार घेण्याचे कार्य अत्यंत थोर पुण्यकार्य आहे. हेकार्य जिभेच्या नुसत्या टकळीने होणार नाही. पोटातल्या आतड्यांना पीळ पडला पाहिजे. अलीकडच्या सभात घुसलेला तो ठरावांचा नाटकीपणा प्रथम पेटवून उध्वस्त करा. ठराव करून स्वराज्य हस्तगत होत नसते. शिवाजी महाराजांची अशी शिकवण नाही. स्वराज्यासाठी प्रथम आत्मविश्वास कमवावा लागतो. `आपण कोण?’ याची स्पष्ट कल्पना एकदा दीनदुनियेला करून द्या. तुम्ही माणसे आहात, तुमचे हक्क अमुक आहेत, या आत्मज्ञानाचा खेडोखेडी शिवसंदेश जाऊ द्या. हा संदेस बहुजनसमाजाच्यारोमरोमांत भिनला पुरे की शिवरायास आठवावें या दीक्षेची त्यांना आठवण करण्याची जरूरच उरणार नाही. भिक्षुकशाहीच्या अमंगल वाममार्गी डावपेचांमुळे गेल्या १००-१५० वर्षांत सारे महाराष्ट्र आत्मस्वरूपाला पूर्ण पारखे झाले आहे. ही आत्मस्वरूपाची ओळख पटवून देणारे स्वार्थत्यागी स्वयंसेवक आता क्षणाचाही विलंब न लावता उसाळ्या मारीत पुढे आले पाहिजेत.
भले कुळवंत म्हणावे । तेंही वेगी हजीर व्हावें ।
हजीर नहोतां कष्टावें । लागेल पुढें ।।
ही श्रीसमर्थांची हाक विसरू नका. स्वराज्य म्हणजे काय याची खरी कल्पना जनतेस करून दिली पाहिजे.
आजची स्थिती फारच घोटाळ्याची झालेली आहे. ढेकणाचिलटाइंतकाच स्वराज्य पुराणांनी गरीब रयतेला गांजणारे भिक्षुकशाही ठग आज सर्वत्र पसरलेले आहेत. त्यांच्या कारस्थानापासून दीनदुयनियेचे संरक्षण करणारे मराठे तरुण अहमहमिकेने पुढे सरसावले पाहिजेत. या वेळी एकमुखाने स्पष्ट जाहीर केले पाहिजे की, ज्या पुण्याच्या भिक्षुकशाहीने सातारच्या छत्रपतीचे सिंहासन जाळले, ज्यांच्या अघोर कर्मांनी विलायतचा टोपीवाला आमच्या घरात घुसला, ज्यांच्या स्वार्थी कारस्थानामुळे जनता अन्नास मोताद झाली, त्या भिक्षुकांच्या राष्ट्रीयपणावर आमचा मुळीच विश्वास नाही. ते आमचे पुढारी नव्हत, ते आमचे कोणी नव्हत. पुण्यास बळावलेली राष्ट्रीय भिक्षुकशाही म्हणजे शिवाजीच्या महाराष्ट्राच्या पाठीवर वाजलेले काळपुळीचे भयंकर करट आहे. पुण्याची राष्ट्रीय भिक्षुकशाही म्हणजे महाराष्ट्राच्या जीवाग्री झोंबलेली मूळव्याध आहे. गरीब रयतेला सोंगाढोंगांनी पिळून काढणा-या भिक्षुकी जळवांचा तो पोळा आहे. यांच्या ढोंगाला बहुजन समाज बळी पडणार नाही अशी खबरदारी घेतली पाहिजे.
समर्थ रामदासांना फितवेखोरांची फार चीड असे. ते जर आज असते तर हेच म्हणाले असते –
बहुत लोक मिळवावे । एकविचारें भरावे ।।
कष्टें करोनि घसरावें । राष्ट्रीयांवरी ।।
सकळ सुखांचा त्याग । करूनि साधिजे हा योग ।
स्वराज्यसाधनाची लगबग । ऐसी असे ।।
याहून करावें विशेष । तरी म्हणावें पुरुष ।
याउपरी आतां विशेष । काय लिहावें? ।।
श्रीशिवछत्रपति महाराजकी जय ।।
[राष्ट्रवीर, ३०-४-२२]
लेख ५
प्रेस आक्टाची पूर्वपीठिका
शिवाजीचे वाघनख, भवानी तलवार किंवा अलीकडील युद्धांतील हॉवित्झर तोफ ही शस्त्रे भयंकर प्राणघातक म्हणून जरी प्रसिद्ध असली, तथापि त्यांचे निरीक्षण करण्यात एक प्रकारचे कौतुकही वाटते. गुरख्याच्या कुकरीचा भयंकर पराक्रम व्रतमानपत्राद्वारा ऐकूनसुद्धा, कुकरी कशी असते हे पहाण्याची जिज्ञासा होणे व ती कोणी दाखविली असता तिच्या त्या प्राणघातक तीक्ष्ण पात्यावर सकौतुक दृष्टी खिळून राहणे, हे अगदी स्वाभाविक आहे. उलट त्याच पात्याने केलेल्या अमानुष अत्याचाराचा इतिहास खुद्द गुरखाच सांगत असता, प्रेक्षकांचे अंतःकरण सहृदयतेने निशेधाचे एकसारखे धक्के मारीत असतानाही त्याच्या डोळ्यातून त्या टीचभर पात्याच्या पराक्रमाबद्दल प्रशंसेचे अश्रू टपटपा गळल्यावाचून राहत नाहीत. ही गोष्ट प्रत्यक्ष हत्यारांची झाली. परंतु मानवी साम्राज्यात बलाबलाच्या चढाओढीच्या ताजव्यात जित व जेते यांचा जो एक प्रकारचा `सी-सॉ’चा खेळ सुरू असतो व ज्याला `राजकारण’ असे शर्करावगुंठित नाव देण्यात येते, त्या राजकारणाच्या समर्थनार्थ जेते लोक जित लोकांकरिता जे कित्येक शाब्दिक नियम ऊर्फ कायदे करून ठेवतात, त्यांनाही वेळी तीक्ष्ण हत्यारांची उपमा देणे केव्हावी अयोग्य होणार नाही. ग्रीक, रोमन साम्राज्याच्या काळापासून तो आजतागायत भिन्नभिन्न राष्ट्रांच्या इतिहासांचे जर कोणी नुसते वरवर निरीक्षण करील, त्यालासुद्धा असे आढळून येईल की, खरोखरीच्या हत्यारांनी आजपर्यंत जितका रक्तपात व प्राणहानि झाली असेल, त्यापेक्षा अनंतपट रक्तपात व मानवी प्राण्यांचे खून ह्या शाब्दिक हत्यारांनी केलेले आहेत.
प्रातीन काळच्या इतिहासाला अंधा-या युगाचा इतिहास म्हणून हसणा-या अर्वाचीन सुधारकांना आपण मोठे झगझगीत प्रगतीच्या सूर्यप्रकाशात वावरणारे म्हणून जो मिथ्या अभिमान व पोकळ डौल वाटत आहे, त्याचे चरचरीत खंडण करायला प्रेस आक्टाइतके दुसरे खंबीर शस्त्र तेच. या शस्त्राचा प्राचीन रोमशाहीपासून तो आजतागायतपर्यंतचा इतिहास पाहिला, तर स्वातंत्र्याच्या बढाया मारणारे, प्रगमनशीलतेच्या टि-या पिटणारे आणि सुधारणेच्या बाबतीत सा-या जगाजे जगद्गुरु म्हणवून दिमाख मिरवणारे पाश्चात्त्य युरोपियन लोक सध्याच्या विसाव्या शतकात अंधारात आहेत की उजेडात आहेत, हे तेव्हाच सिद्ध होते.
मानवी विचारांच्या व्यक्तीकरणाच्या दरवाज्यावरच किंवा खुद्द ग्रंथकाराच्या मानेवरच पहारेक-याची नेमणूक करण्याच्या पद्धतीला नाकडोळे मुरडणारे किंवा वेळी हातबोटे चोळणारे प्रगमनशील अर्वाचीन शालशिष्ट, प्राचीन रोमीश प्रेस आक्टाचे दुस-याच्या डोळ्यांतील कुसळ दाखविताना, खुद्द आपल्याच डोळ्यांतील मुसळ मात्र साफ विसरून जातात. प्राचीन काळच्या इतिहासाला शिव्या देणारे वीरमहावीर सध्या आपल्या पायाखाली काय जळत हे, हे जर शुद्धीवर येऊन नीट पाहते, तर आजचा हा निबंध लिहिण्याचा आमच्यावरील प्रसंग खास टळला असता.
प्रेस रिप्रेशन किंवा छापखान्याची गळचेपी म्हणजेच मानवी विचार-व्यक्तीकरणाच्या गळ्याला सरगाठ मारून लटकावलेली फासाची दोरी. या संस्थेचा उगम कसा झाला, कोणी केला वगैरे गोष्टींचा लागावा तितका स्पष्ट शोध अजून लागला नाही. परंतु ज्याप्रमाणे कामावरून कारागिरांची परीक्षा सहज होते, त्याप्रमाणे प्रस्तुत संस्थेची मुहूर्तमेढ `भीती’ व `खबरदारी’ या दोन नारळांच्या तोरणाने भूषित करून गाडली गेली असावी, यात मुळीच संशय नाही. मात्र पुढे या संस्थेला दत्तक घेऊन, कन्येप्रमाणे तिचे कानकेस करण्याची पुण्याई रोमशाहीतील `इन्क्विझिशन’ किंवा धर्मनिरपेक्ष सभेने संपादन केली. येथपासून हिचा इतिहास बिनतोड सापडतो.
पूर्वी भिक्षु (मंक) लोकांच्या मठात हस्तलिखित ग्रंथांचा मोठा संग्रह असे. त्यास इन्फर्नो म्हणत असता. या इन्फर्नोमध्ये भिक्षु लोक कित्येक मना केलेले ग्रंथ दडपून ठेवीत असत आणि या ग्रंथसंग्रहाकडे ते स्वतःही कधी ढुंकून पाहत नसत. परंतु कित्येक मना केलेले ग्रंथ मात्र त्यांच्या मठाच्या तळघरात दडपून ठेवलेले आहेत; हे संशय-पिशाच मात्र सर्वत्र बोकाळत असे. पुढे रोम आणि माद्रीद येथे ही पिशाच्च मात्र सर्वत्र बोकाळत असे. पुढे रोम आणि माद्रीद येथे ही पिशाचांची वावटळ इतकी जोराने उपस्थित झाली की, ट्रेट येथील पोप चवथा पायस याने आपला एक दरबार भरवून विक्लीफ, हस्स आणि लूथर यांचे ग्रंथ सापडतील तेथे जप्त करण्याचा किंवा वेळी त्यांच्या वाचकांसही मृत्यूच्या शिक्षेची धमकी घालण्याचा पक्रम केला. याच दरबारात मशारनिल्हे जगद्गुरु पोप महाराजांच्या चरणी आक्षेपार्ह ग्रंथांचे एक मोठे थोरले सूचीपत्र अर्पण करण्यात आले आणि जगद्गुरुंनी प्रसाद म्हणून `ग्रंथांची तपासणी करण्याच्या नियमांचा मसुदा’ आपल्या भक्तमंडळींच्या पदरात अंमलबजावणीकरिता टाकला. अर्वाचीन प्रेस आक्टाचा जन्म अशी रीतीने झालेला आहे. उपरिनिर्दिष्ट पोप महाराजांच्या मागे त्यांच्या दंडधारकांनी हे नियम पुढे वाढवून बरेचकडक केले आणि खुद्द श्रींचेच बाठबळ या बाबतीत पुष्कळ असल्यामुळे, अनुयायी भक्तमंडळींनाही आक्षेपार्ह ग्रंथांचे सूचीपत्रक यथास्थित लठ्ठ फुगविण्यास बरीच उमेद आली. ग्रंथांचे चौकसगार लोक निवडण्यात येऊन, त्यांचे एक मंडळ बनविण्यात आले व त्यांना ``Masters of the holy palace’’ – पवित्र मंदिरांचे संरक्षक – ही उपाधि अर्पण करण्यात आली. माद्रीद, लिस्बन, नेपल्स व कित्येक खेड्यापाड्यांतूनही आणखी असे चौकसगार अधिकारी नेमण्यात आले व त्यांना मानवी विचार व्यक्तीकरणाच्या अभिव्याप्तीवर डोळ्यांत तेल घालून नजर राखण्याची सक्त ताकीद फर्माविण्यात आली. आक्षेपार्ह ग्रंथांच्या या याद्यांना `Indexes’ असे म्हणत असत आणि वाङ्मयाची अशा रीतीने दडपेगिरी करणा-या या दंडेली समितीला `The congresgation of the Index’ असले अजूनही म्हणतात. या इंडेक्समध्येही दोन भेद असत. नुसते इंडेक्स म्हटले म्हणजे जी पुस्तके उघडली असताही येशूहत्येचे पातक लागते, अशा मना केलेल्या पुस्तकांचे सूचीपत्र असे समजण्यात येत असे; व एक्सपर्गेटरी इंडेक्स म्हणजे ज्या पुस्तकांचे सशोधन होईपर्यंतच ती ती आक्षेपार्ह मानली गेली आहेत, अशा पुस्तकांचे सूचीपत्र समजण्यात येत असे. कोणत्याही भाषेत, कोणत्याही विषयावरील लिहिलेले पुस्तक असो, त्यात जर एकादे प्रमेय किंवा असंदिग्ध वाक्यकिंवा एखादा सुलट लिहिलेला असूनही पर्यायाने उलट अर्थ दर्शविणारा शब्द जर त्यात असेल, तर ते पुस्तक ट्रेन्ट येथील वरिष्ठ पवित्र मंदिराच्या संरक्षक समितीने आक्षेपार्ह म्हणून खुशाल इंडेक्स-जमा करावे; इतकेच नव्हे तर मनुष्य सुशिक्षित असो वा अशिक्षित असो, राजा असो नाही तर शेतकरी असो, इटालियन, स्पानियर्ड किंवा नेदरलंडर असो, त्याने ट्रेन्ट येथील समितीच्य विचार-संमतीचा टांकसाळी शिक्का मारलेल्या पुस्तकांशिवाय कोणतेही पुस्तक वाचू नये, असा कडकडीत निर्बंध असे. या नियमाचे उल्लंघन करणारे लक्षावधी प्राणी केवळ या एकाच शस्त्राच्या तडाख्याने ठार करण्यात येत असत.
ज्या संतमंडळींनी या इंडेक्सपत्राची रचना करण्याचे काम आपल्या अंगावर घेतले होते, त्यांचा असा समज होता की ज्याअर्थी निष्क्रिय आज्ञाधारकपणा हा मानवी स्वभावाचा एक धर्म आहे, त्याअर्थी आपल्या इंडेक्समध्ये जमा केलेल्या पुस्तकांच्या विरुद्ध कोणी विशेष प्रतिकार करणार नाही; उलट आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या प्रसिद्ध होणा-या प्रत्येक पुस्तकाला एकदा या इंडेक्सच्या यादीत घुसडून दिले की त्यांचीही तोंडे बंद होतील! मानवी विचारांना अजिबात नष्ट करण्याचे किंवा निदान खच्ची करण्याचे जे सामर्थ्य प्रत्यक्ष विश्वभक्षी काळात नाही, ते आपल्या इंडेक्स चोपड्यात आहे, असे समजणा-या प्राचीन संतसमितीच्या आणि अर्वाचीन सेन्सारप्रभृतींच्या बुद्धिमांद्याला हसावे की रडावे हे आम्हाला समजत नाही. प्रतिस्पर्धी पाखंडी (?) मंडळींच्या ग्रंथांची जो जो इंडेक्सपत्रात समाराधना होऊ लागली, तो तो त्यांनीही त्याच ग्रंथांचे पुनर्मुद्रण मोठ्या दक्षतेने गुपचूप करून, त्यात सणसणीत टीका व लांबलचक प्रस्तावना यांची पुस्ती जोडून, प्रसार करण्याच कामही जारीने चालू ठेवले.
ऑक्सफर्ड येथील डॉ. जेम्स या नावाच्या एका पठ्याने तर खुद्द इंडेक्स पत्रकाचीच एक नक्कल प्रत्येक ग्रंथापुढे आपली सणसणीत टीका लिहूनच प्रसिद्ध केली. म्हणजे ज्या उद्देशाने इंडेक्सची योजना करण्यात आली, त्याच्याविरुद्ध उद्देशानेच सर्व जनता तिचा उपयोग करू लागली. कॅथॉलिक संतप्रभृतींनी ज्या ग्रंथांस नाके मुरडावी, तीच पुस्तके त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी मुद्दाम आवडीने घ्यावी; इतकेच नव्हे तर इंडेक्समध्ये समाविष्ट झालेल्या ग्रंथांशिवाय तर ग्रंथांस मुळी हातच लावायचा नाही असा त्यांनी नियमच करून टाकला होता. पुढे इंडेक्सच्या एका भागात, कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे, ज्यांची डोकी व पुस्तके इंडेक्सजमा करण्यात आली होती अशा ग्रंथकारांचे जेव्हाएक लिस्ट प्रसिद्ध झाले, तेव्हा त्याला हे प्रतिस्पर्धी लोक लोकोत्तर बुद्धिमान् नरपुंगवांचे सूचीपत्रक अशा नावाने संबोधू लागले.
या इंडेक्सपद्धतीचे परिणाम मोठे चमत्कारिक घडू लागले. निरनिराळ्या देशांतल्या चौकसगारांची मते एकाच बाबतीत अगदी परस्परविरुद्ध पडू लागली. नेदर्लंड`’ येथील मुख्य चौकसगार अधिकारी विद्वान एरियस मॉन्टेनस (Arias Montanus) हा अन्टवर्प येथील इंडेक्ससमितीचा चालक असतानाही खुद्द त्याचेच ग्रंथ रोमन इंडेक्समध्ये जमा झालेले पहाण्याचा त्यास प्रसंग आला. नेपल्स येथील इंक्विझीटर (चौकसगार) तर स्पॅनिश इंडेक्सवर इतका खवळून गेला की ती इंडेक्स माद्रीदमध्ये छापली गेलीच नाही, अर्थात रद्द समजावी, म्हणून हातपाय आपटू लागला. सा-या जगाने आम्ही देऊ त्या मताच्या विरुद्ध न जाता त्यास मान डोलवावी, म्हणून सांगणारे व अधिकाराच्या जोरावर तसा हेका धरणारे हे महापंडित इंक्विझीटर लोकं आता परस्परांचीही मते मान्य करीतनासे झाले! त्यांच्यातच एक यादवी युद्ध (Civil war) सुरू झाले आणि एक दुस-याच्या बोकांडी बसण्यासाठी धडपडू लागला. ग्रंथपरीक्षणाच्या बाबतीत एकाने दहा आक्षेपार्ह स्थळे दाखवावी; दुस-याने तीस स्थळे दाखवून पहिल्यास मूर्खात काढावे; आणि तिस-याने सबंध ग्रंथच्या ग्रंथ आक्षेपार्ह ठरवून, त्यास इंडेक्स जमा करण्याची शिफारस करावी व पहिल्या दोघांना बेअक्कल ठरवावे. अशी खुद्द चौकशीच्या न्यायाधिका-यांतच बेबंदशाही माजली. पुढे तर ते स्वतःच्या मतांबद्दल स्वतःच इतके साशंक होत गेले की, ``आम्ही पुस्तकातील दोष सुधारले आहेत व पुस्तक वाचण्यास काही हरकत नाही असे म्हटले तरी चालेल; तथापि आणखीही काही दोष सापडणार नाहीत असेही नाही. म्हणून तशी सुधारणा होईपर्यंत थांबणे बरे!’’ असले डळमळीत अभिप्राय देऊ लागले. अर्थात या डळमळीत अभिप्राय देऊ लागले. अर्थात या मळमळीत अभिप्रायामुळे ग्रंथांची व ग्रंथकारांची व्यर्थ कुचंबणा होऊ लागली व एकदम इंडेक्सजमा करण्याची पद्धत बरी, कारण एक घाव दोन तुकडे होऊन ग्रंथकाराला रडायला तरी मोकळीक मिळत असे; पण या एक्सपर्गेटरी इंडेक्स पद्धतीने धड ना जिवंत धड ना मृत्यू अशी स्थिती तरी नको, असा सर्वत्र निषेधाचा ध्वनि निघू लागला.
हे चौकसगार लोक अजूनही `Purgers’ म्हणजे `रेचके’ किंवा `Castrators’ म्हणजे `खच्ची करणारे’ या संज्ञेने संबोधिले जातात. मिल्टन तर त्यांना `Executioners of books’ – ग्रंथांना फासावर चढविणारे मांग असेच जेथे तेथे म्हणतो. एक्सपर्गेटरी पद्धतीप्रमाणे ग्रंथांचा सपशेल खून न करिता, त्यातील आक्षेपार्ह स्थळेच काय ती दुरुस्त करण्याचा जेव्हा हे अकटोविकटो पंडित उपक्रम करू लागले, तेव्हा कित्येक महत्त्वाचे भाग अजिबात गाळणे, नवीन पॅरे मध्येच घुसडणे, खुद्द ग्रंथकाराच्याही टाळक्यात न येणा-या व पुस्तकातील मजकुराशीही व्यस्त प्रमाणात विसंगत असणा-या कल्पना मध्येच ढकलणे, इत्यादी शोचनीय प्रकार घडू लागले. आक्षेपार्ग मजकूल गाळण्याचा अधिकार मिळाल्याबरोबरच आपण जणू काय सर्वज्ञ महापंडित झालो, असा भ्रम झालेल्या सेन्सॉरच्या डोळ्याला नेहमीच्या प्रचारातील साधे शब्दसुद्धा वाळूच्या कणाप्रमाणे कसे खुपतात, हे आमच्या हिंदुस्थानातील प्रस्तुतच्या पिढीला अधिक विशद करून सांगण्याची जरूरी नाही. शिवाजी महाराजांनी मराठी राज्य स्थापन केले, या विधानापेक्षाही त्यांनी एखादे सेवासदन स्थापन केले, असली विधाने केलेला महाराष्ट्राचा इतिहास सेन्सॉर तेव्हाच `पास’ करतो.
त्याने अफझुलखानाचा खून केला तेव्हा ही गोष्ट जातीजातींत वैमन्स्य उत्पन्न करणारी असल्यामुळे, त्या ऐवजी चिलटे डास ठार मारणारी `कटोल पावडर’ तयार करण्याचा कारखाना त्याने काढला, असा मजकूर ज्या पुस्तकात असेल, ते मशारनिल्हे रेचक्या प्रभृतीच्या रेचकविधीपासून तेव्हाच मुक्त होते. असो! इंडेक्सच्य अमदानीत हे असले प्रकार इंक्विझिटर लोक मोठमोठ्या ग्रंथकारांच्याग्रंथांत बेधडक घुसडून देऊन ते प्रसिद्ध करण्याची परवानगी देत असत. अर्थात् `विनायकं प्रकुर्वाणी रचयामास वारनम्’ असला भयंकर देखावा पाहून बिचारा ग्रंथकार – तो जर स्वमताभिमानी असेल तर, किंवा रेचकविधीतून आपला ग्रंथ शुद्ध होऊन बाहेर पडेपर्यंत एकदम जमा करण्याच्याकायद्याची धार बोथट करून, न्यायबुद्धीचा टेंभा मिरविण्यासाठी, एक्सपर्गेटरी इंडेक्सची जी सवलत तत्कालीन पोप महाराजांच्या बगलबच्च्या रेचक्यांनी अंमलात आणली, ती अधिकच तापदायक होऊ लागली. परंतु एखाद्या ग्रंथकाराने आपल्या हाताने शुद्ध करून ठेवलेली ग्रंथाची प्रत त्याच्या `ऊईल’प्रमाणेच महत्त्वाची असल्यामुळे, जनतेचाही तिच्या शुद्धतेवर कायदेशीर हक्क असतो. अर्थात रेचकविधीत त्यातील मजकुराची रेचक्याने केलेली खोडाखोड, गाळागाळ, दडपादडपी इत्यादी कायदेशीर काटे, सराटे मूळ प्रतीवरून झाडून साफसूफ करून, अस्सल प्रतिबरहुकूम आवृत्ती काढणे, हे जनतेचे कर्तव्यकर्मच होऊन बसते व ते तत्कालीन जनतेने ग्रंथकारांच्या पश्चात् यथासांग बजाविण्यास मुळीच कसूर केली नाही.
मिल्टनने म्हटले आहे की, ``या एक्सपर्गेटरी पद्धतीने कित्येक उत्कृष्ट जुन्या ग्रंथकारांची आतडी इतक्या निष्ठुरपणाने सोलून टाकली की मृत मनुष्याच्या थडग्याचीही इतक्या निर्दयतेने कोणी वाताहत करण्यास प्रवृत्त होणार नाही.’’ अर्थात या पद्धतीने ग्रंथकाराचे जीवन-रुधिरच शोषून टाकल्यामुळे त्यांची पार चिपाडे बनून ते भुतांप्रमाणे भेसूर बनल्यास आश्चर्य ते कसले? स्पेन व पोर्तुगाल देशात एकेका ग्रंथाला पाचपाच सहासहा कोर्टांच्या फिल्टरातून गाळून शुद्ध व्हावे लागत असे. कित्येक वेळा हा शोधनविधीचा काळ चाळीस वर्षांपर्यंत गेल्याचेही दाखले आहेत. लोकोत्तर बुद्धिमत्तेच्या ग्रंथकारांनी तर त्या वेळी या दुष्ट पद्धतीमुळे हैबतच खाल्ली होती. माद्रीद व लिस्बन येथील कित्येक ग्रंथकारांचे ग्रंथ बिचा-या पित्याबरोबरच थडग्यात गेले! यावरून या स्वार्थी व राक्षसी इंडेक्स पद्धतीने किंवा प्राचीन प्रेस आक्टाने ज्ञानाच्या बाबतीत सा-या जगाचे किती अनिर्वचनीय नुकसान केले, याची वाचकांना बरीच कल्पना होईल, अशी आशा आहे. जोपर्यंत केवळ चिमूटभर अशा बलवान व्यक्तिसमुदायाच्या लहरीवर सत्यासत्याची पारख करण्याचा मक्ता अवलंबून आहे आणि केवळ विशिष्ट व्यक्तींच्या हाती ज्ञानजलधीच्या दरवाजाच्या किल्ल्या देण्यात येत आहेत, तोपर्यंत सत्याचा टेंभा आणि ज्ञानाची घमेंड मारण्याचा हक्क या पृथ्वीतलावरल्या कोणाही मर्त्य मानवास असेल, हे सिद्धच होत नाही. मानवी सत्ताधारी कितीही बलवान व त्रिभुवनजेते झाले, तरी सत्याचे स्वरूप अमुकच प्रकारचे असावे किंवा त्याचे निरूपण अमक्यात विवक्षित पद्धतीने व्हावे, हे ठरविण्याचा हक्क त्यांना कसा काय पोहचतो, हे समजत नाही.
फारिया डिसोझा या ग्रंथकाराने सतत २५ वर्षे आपल्या पाठीचा कणा मोडून `The Commentaries on the Lusiad’ हा ग्रंथ लिहिला, आणि त्याची समंजस पंडितवर्गाने मोठी वाहवाही केली; परंतु सत्तामदाने बेफाम झालेल्या इंक्विझिटर प्रभृतींच्या शिक्यामोर्तबाच्या महतीपुढे या नुसत्या विद्वान पंडिताच्या अभिप्रायाला कोण भीक घालतो? झाले; प्रस्तुत पुस्तकांत पाखंडी (heretical) मतांचे प्रतिपादन केले आहे, अशा सबबीवर ग्रंथकाराला चौकशीच्या कोर्टात खेचण्यात आले. माद्रीद येथील अधिका-यांना पाखंडीपणाचा आरोप सिद्ध करता येईना; म्हणून लिस्बनच्या कोर्टात खटला वर्ग केला. लागलेच सदर्हू पुस्तकाची विक्री बंद ठेवण्याचा हुकूमनामा सुटला. लुसिअड*१ काव्याचा कर्ता पाखंडी नव्हता, किंवा प्रस्तुतचा टीकाकारही पाखंडी नसून उलट कट्टा कॅथॉलिकी मताचा आहे, वगैरे सप्रमाण पुरावा देता देता बिचारा डिसोझा अगदी मेटाकुटीस आला. सरतेशेवटी त्याच्या पुस्तकाची इंडेक्सच्या काळमुखातून एकदाची कशीबशी सुटका झाली. परंतु पुस्तकविक्रीच्या बंदीमुळे आणि खटल्याच्या खर्चामुळे सांपत्तिक बाबतीत त्याचा पाय जो खोल चिखलात रुतला तो कायमचाच!
नॅनी नावाच्या एका लेखकाने `व्हेनिसचा इतिहास’ लिहिला होता. तो मात्र रेचकविधीतून निर्लेप बाहेर पडला. कारण त्यात `राजाविरुद्ध काहीही नव्हते’ – Nothing against princes. यावर टीका करताना डिझरायलीने म्हटले आहे की, ``त्या वेळी राजे लोक तर धर्माचे अवतार असले पाहिजेत, किंवा इतिहासकार तरी बिलंद लफंगा असला पाहिजे.’’
जेव्हा इंडेक्स पत्रात जमा केलेल्या पुस्तकांचा नाश होण्याऐवजी किंवात्याबद्दल लोकांत तिटकारा उत्पन्न होण्याऐवजी, उलट लोक त्यांकडे कौतुकपूर्ण जिज्ञासेने पाहू लागले. तेव्हा सत्याभिमानी येशूच्या भक्तांनी आक्षेपार्ह पुस्तके जमा करून ती सार्वजनिक चव्हाट्यांवर जाळून टाकण्याचा उपक्रम सुरू केला. या सत्राचा फायदा दोन्हीही पक्षांनी यथास्थित करून घेतला. म्हणजे सत्ताधा-यांना ग्रंथ जाळून टाकला म्हणून आनंद वाटत असे आणि भिकार लेखक काही तरी लिहून आपला ग्रंथ एकदा होळीत पडला म्हणजे त्याची किंमत वाढली असे समजून हर्ष मानीत असत.
सरकारी कटल्याने किंवा सरकारजमा झाल्याने भिकार पुस्तकांची किंवा दरिद्री वर्तमानपत्रांची महती कशी वाढते आणि एरवी कोनाकोप-याच्या सांदीत पडलेल्या व्यक्ति कशा बेगडी मान्यतेच पोहोचतात, हे अलीकडच्या लोकांना तरी विशेष विशद करून सांगण्याची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे अलीकडे `वर्तमानपत्राचे वर्गणीदार वाढविण्याचे खटले’ प्रेस आक्टामुळे होत असत व आहेतही, त्याचप्रमाणे पूर्वी वर सांगितलेल्या अग्निसत्राच्या धामधुमीत सुक्याबरोबर ओले या न्यायाने कित्येक भिकार ग्रंथकारांनीही आपली पुस्तके होळीजमा करून ग्रंथकर्तृत्वाची मानमान्यता मिळवण्याची संधी फुकट जाऊ दिली नाही. `Erasmus’s Colloquies’ या पुस्तकाच्या प्रकाशकाने हरप्रयत्नाने ते होळी-जमा करण्याची खटपट करून, पुढे त्याचा खप चोवीस हजारांवर नेऊन रगड पैका मिळविला. यांत एक गोष्ट एगदी स्पष्ट सिद्ध होते की, पक्षांध बनलेला मनुष्य – मग तो कोणत्याही पक्षाचा अगर मताचा असो – त्याच्या मानसिक वृत्तीचा मसाला एकाच दुकानातला असतो. ग्रंथ जाळून टाकणा-या दीर्घ शहाण्या रेचक्या अधिका-यांना `ग्रंथ जाळणे म्हणजे त्यातील मतांचे खंडण करणे नव्हे,’ हे कळत नसे, किंवा तसे त्यांना सांगून पटत नसे; आणि `रेचक-सत्रांत ग्रंथ पडून अग्नये स्वाहा होणे म्हणजेच ग्रंथकर्तृत्वाची अखेर साधणे नव्हे,’ हे ग्रंथकारांच्या ध्यानी येत नसे.
असा एक शोध लागतो की, इंग्लंडच्या आठव्या हेनरी राजाच्या कारकीर्दीत, टॉन्स्टॉल नावाचे एक लंडनचे बिशप होते. ते फार फाजील `मवाळ’ वृत्तीचे होते. इतके की, त्यांच्या मवाळपणाबद्दल सारे लोक त्यांची टीकाही करीत. या वेळी ग्रंथाऐवजी खुद्द ग्रंथकारालाच जाळून टाकण्याचा एक बूट निघाला होता आणि हे मवाळ बिशप अर्थात् या बुटाच्या विरुद्ध होते. परंतु मनुष्य कितीही मवाळापेक्षा मवाळ असला, तरी त्याला स्वार्थ थोडाच सुटला आहे? टिन्डाल नामक लेखकाने `नवा करार’ या ख्रिस्ती धर्मग्रंथावर भाषांतरात्मक विवेचनाचा एक ग्रंथ प्रसिद्ध केला होता. तो या बिशपाला नापसंत होता. अर्थात् त्याच्या प्रति जप्त करून या सार्वजनिक अग्मिसत्रांत एकदा जाळून फस्त कराव्या, असे त्याच्या मनाने घेतले. सन १५२९मध्ये सदर्हू बिशपसाहेब आपल्या दो-यावर असताना, टिन्डालच्या मतानुयायांनी माहेरघर किंवा आश्रयस्थान बनविलेल्या आन्टवर्प शहरी आले असताना हा त्यांचा दुराग्रह बळावला. या कामी त्याने एका इंग्रज व्यापा-याची मदत घेतली व त्याला टिंडालच्या पुस्तकाच्या प्रति गोळा करण्यास सांगितले. हा व्यापारी खुद्द टिंडालचाच गुप्त अनुयायी होता. त्याने टिंडालला ही सर्व हकीकत सांगितली. ती एकून टिंडालला अत्यानंद झाला. कारण पहिल्या आवृत्तीतल्या कित्येक चुका दुरुस्त करून नवी आवृत्ती काढण्याचे त्याच्या मनात फार होते; परंतु पहिल्याच आवृत्तीच्या प्रति त्याच्या अंगावर पडून राहिल्या होत्या. अर्थात् त्या व्यापा-यामार्फत दामदुप्पट किंमतीला त्याने आपल्या सर्व प्रति विकल्या आणि बिशपनेही त्या पडेल त्या किंमतीस विकत घेतल्या. सर्व प्रति हाती येताच बिशपसाहेबाने त्या चीपसाईड येथे अग्न्यार्पण केल्या. या वेळी या कृत्याचा ``A burning of the word of God’’ – ईश्वरी शब्दाची होळी या संज्ञेने लोक नुसता निषेधच करून स्वस्थ बसले नाहीत, तर दुस-या आवृत्तीच्या प्रतीला पडेल ती किंमत देऊन विकत घेण्यात अत्युत्सुक झाले. टिंडालने ताबडतोब `सुधारलेली दुसरी आवृत्ती’ बाहेर काढली आणि तिच्या विक्रीचा जिकडेतिकडे मारे तोबा उडाला.
एका टिंडालपंथीय पुस्तकविक्याला लंडनच्या लॉर्ड चॅन्सेलरने खासगी मुलाखतीत विचारले की, ``तुमच्या पक्षाला इतका आश्रय व जोर आंटवर्पमध्ये कसा व कोणी दिला, हे मला खासगी रीतीने सांगशील काय? मी तुझी माहिती कोठेही फुटू देणार नाही, किंवा तुमच्या पंथावर खटलाही करणार नाही.’’ त्या पुस्तकविक्याने सांगितले, ``महाराज, हे सारे लंडनचे बिशप टॉनस्टॉलसाहेब यांचेच उपकार आहेत. त्यांनीच पहिल्या आवृत्तीच्या सा-या प्रति दामदुप्पट किंमतीला विकत घेऊन, आम्हाला ही दुसरी आवृत्ती काढण्याचा सुप्रसंग आणला.’’ बिचा-या बिशप साहेबाला हे उलटे `कॉम्लिमेण्ट’ मिळालेले ऐकून काय वाटले असेल, त्याची आपण कल्पनाच करावी हे बरे!
आठव्या हेन्रीचा काळ म्हणजे अनिश्चित मतांचा काळ होता. या वेळी धर्मभीरू आणि पाखंडी या दोघांच्याही ग्रंथांना होळीत पडावे लागले. एडवर्डच्या अमदानीत कॅथॉलिक ग्रंथांवर संक्रांत बसली होती आणि मेरी राणीच्या वेळी प्रोटेस्टंट ग्रंथांचे पर्वत अग्नेयस्वाहा झाले. एलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीत राजकीय चोपड्यांनी सरपणाचे काम केले, तर पहिला जेम्स आणि त्याच्या पुत्रांच्या शाहीत `अब्रूनुकसानी करणारी चोपडी’च काय ती होळीत पडली.
इटालियन डोक्यांतून प्रसवलेली आणि स्पॅनिश भिक्षूंच्या लहरीने पोसलेली ही इंडेक्स-पद्धत अशा रीतीने `वाङ्मयाचे काळेकुट्ट कालयुग’ अस्तित्वात आणण्यास कारणीभूत झाली. आस्ते आस्ते या कालयुगाची छाया युरोपातील सर्व राष्ट्रांत पसरत पसरत, सरतेशेवटी मतस्वातंत्र्य, वाक्स्वातंत्र्य, आणि वैचारिक स्वातंत्र्य या बाबतीत धुरीणत्वाचा झेंडा फडकविणा-या इंग्लंडमध्येसुद्धा ही महामारी घुसली. पुस्तके जमा करणे, निदान ती `लायसेन्स’च्या गंधाक्षतांनी मंडित झाल्यावर प्रसिद्ध करणे, या पद्धतीची माता जरी वरील इंक्विझिशनच होय, तरी इंग्लंडमधील रेचक्यांचा कटाक्ष प्रथम प्रथम धार्मिक ग्रंथांवरच विशेष असे. प्रस्तुत महामारीच्या दणक्याखाली ब्रिटनदेश कितीक वर्षेपर्यंत तरी कण्हत कुंथत पडला होता आणि आपल्य ग्रंथांचे मोलवान अवयव सार्वजनिक रीतीने छिन्नभिन्न करण्याच्या बेशरम प्रसंगामुळे हैबत खाऊन, कित्येक बुद्धिवंतांनी आपल्याच ग्रंथांत निराशेमुळे `वाङ्मयात्मक आत्महत्या’*२ करून घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. विल्यम कॅम्डेन (१५५१-१६२३) या विख्यात इतिहाससंशोधकाला `इलिझाबेथ माहात्म्य’ हा ग्रंथ संपूर्ण छापण्याची परवानगीच मिळेना. अधिकारी तर काही काही भाग अजिबात खच्ची करून टाकण्याचा हेका धरून बसले. कॅम्डेनने ते सर्व आक्षेपित भाग दी दाऊने (De Thou) नामक फ्रेंच इतिहासकाराकडे रवाना केले. कॅम्डेनच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती सन १६०५त बाहेर पडल्यानंतर दोनच वर्षांनी दी दाऊने ते आक्षेपित भाग जसेच्या तसे बिनचूक छापून प्रसिद्ध केले. लॉर्ड हर्बर्टने लिहिलेल्या `आठव्या हेन्रीचा इतिहास’ या पुस्तकालाही ही महामारी अशीच भोवली! पण बिचा-याचा इतिहास अखेरीस मूळ प्रतिबरहुकूम छापून निघाला नाही तो नाहीच. लॉर्ड ब्रुक यांच्या `कवितासंग्रहा’त पहिल्या वीस पानांचा पत्ताच नाही. यात धर्मविष्यक काही कविता होत्या आणि आर्चबिशप लॉड (Laud) यांच्या हुकमाने त्या रद्द करण्यात आल्या होत्या. सर मॅथ्यू हेल (१६०९-१६७६) हे क्रॉमवेलच्या पार्लमेंटाचे एक मेंबर होते व सन १६७१ त हे लॉर्ड चीफ जस्टिसही झाले होते. यांनी कित्येक ऐतिहासिक पुराव्याचे लेख लिहून मोठा ग्रंथसंग्रह तयार केला होता.परंतु त्यांच्या कित्येक विद्वान मित्रांच्या उत्कृष्ट ग्रंथांच्या बोकांडी तपासणीची साथ बसल्यामुळे आणि खुद्द तपासणीच्या पद्धतीच्या तत्त्वाविरुद्धच ते असल्यामुळे, हयातीत आपला एकही ग्रंथ त्यांनी छापण्याचा उपक्रम केला नाही. इतकेच नव्हे तर आपल्या मृत्यूनंतरही तो कोणी छापण्याच्या भरीस पडू नये, अशी त्यांनी अट घालून ठेवली होती. पुढे त्यांनी आपले सर्व हस्तलिखित बाड `Society of Lincoln’s Inn’ या संस्थेच्या ताब्यात जपून ठेवण्याकरिताच स्वाधीन केले.
छापखान्याची इभ्रत व स्वातंत्र्य यांवर इंग्लंडातील कायद्यांनी कधीही जुलूम केला नाही असा एक इंग्लंडचा लौकिक आहे. कोणतेही पुस्तक छापण्याविरुद्ध असा एकही कायदा केलेला नाही; `स्टार चेंबर’चा एक हुकूमनामा (Decree) मात्र आहे असे एकदा सेल्डन नामक प्रसिद्ध वकील बोलले होते. नाही म्हणावयाला कधीमधी विवक्षित ग्रंथ आणि त्यांचे कर्ते यांच्याविरुद्ध जाहीरनामे फडकत असत व केव्हा केव्हा परदेशस्थ ग्रंथांना मनाईही करण्यात येत असे. एलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीत छापखान्यांवर उघड उघड हल्ला करण्याऐवजी त्यांवर आडून गोळ्या मारण्याचा उपक्रम बराच प्रचलित होता.
बाईचा राज्याधिकारावरचा हक्क आणि राजाचा राजधर्म या दोन बाबतीत रोमन कॅथॉलिक पक्ष हा आधीच विरुद्ध असल्यामुळे, त्यांच्या चळवळींना भिऊनच एलिझाबेथला प्रेससंस्थेकडे डोळ्यात तेल घालून पहात बसावे लागे. परदेशस्थ (Foreigon) पुस्तकांना - `Books from any parts beyond the seas’ मज्जाव करण्यात आला होता. त्या वेळी प्रत्यक्ष छापखान्यावर जरी कोणत्याही प्रकारच्या बंधनकारक कायद्याची तलवार केसाला लटकावून लोंबकळत ठेवलेली नव्हती, तरी ग्रंथकाराची मान मात्र सरकारच्या हाती होती. शिवाय एलिझाबेथ राणीचे घ्राणेंद्रिय बरेच तिखट असल्यामुळे तिला राजद्रोहाची घाम जिकडेतिकडे येत असे. आणि तिच्या राजद्रोहाच्या व्याख्येची मर्यादाही जवळजवळ निरंत क्षितिजाप्रमाणे `सर्वव्यापी’ असे. तिने राजद्रोहाच्याआरोपावरून एका ग्रंथकाराला व त्याच्या प्रकाशकाला त्यांचे उजवे हात तोडून टाकण्याची शिक्षा ठोठावली. हा ग्रंथकार म्हणजे लिंकन्स इन या संस्थेचा एक मेंबर मि. जॉन स्टब्स हा होय. वेस्टमिन्स्टर नजीकच्या बाजारपेठेत हा हस्तछेदनविधि झाला. स्टब्सचा उजवा हात छाटल्याबरोबर त्याने डाव्या हाताने आपली टोपी उचलली व मोठ्याने ``God save the Queen’’ असे ओरडला. सारे तमासगीर लोक आश्चर्याने, भीतीने आणि संतापाने स्तब्ध उभे होते. उपरिनिर्दिष्ट कॅम्डेन साहेबही या वेळी हजर होते. स्टब्ससारख्या प्रतिष्ठित मनुष्याची अशी अवहेलना व छळ झालेला पाहून कोणाला संताप येणार नाही? परंतु शिक्षा देणा-या अधिका-यांनाही आपल्या न्याय्यत्वाच्या पुष्ट्यर्थ काही तरी आधार दाखवून, असल्या संतापापासून निर्माण झालेल्या शिव्याश्रापांचे आम्ही भागीदार होऊ शकत नाही, हे सिद्ध करावे लागते. त्याप्रमाणे एलिझाबेथने, ``An act of Philip & Mary against the authors and publishers of seditious writings.’’ या एका कोनाकोप-यात सांदीत पडलेल्या कायद्याची ढाल पुढे केली. कित्येक नामांकित वकिलांनी असे छातीठोक विधान केले की हा कायदा केवळ `हंगामी’ होता आणि तो मेरी राणीच्या बरोबरच थडग्यात गेलेला असल्यामुळे, त्याच्या आधारावर झालेली ही शिक्षा चुकीची व अन्यायाची होय. या प्रामाणिक वकिलांपैकी एकाची रवानगी `टॉवर’च्या अंधारकोठडीत झाली. दुस-या एकाची कानउघडणी होऊन त्याला आपल्या जज्जगिरीच्या जागेवर पाणी सोडावे लागले. असली तोंडदाबी नाइलाज म्हणून स्वतःच्या अर्थाकरिता जरी राज्यकर्त्यांना करावी लागते, तथापि ती त्यांच्या कृत्यांचे सप्रमाण मंडन करू शकत नाही, हे न समजण्याइतके ते केव्हाही दुधखुळे नसतात. कोणी तरी एखादा हस्तक मिळवून त्याच्यामार्फत हा मंडनविधि उरकून घेण्याचा आज कैक दिवसांचा परिपाठच आहेसा दिसतो. त्याप्रमाणे या प्रसंगी एक लॉर्ड चीफ जस्टिस पुढे आले - `आले’ म्हणा किंवा `केले’ म्हणा – त्यांनी असे प्रत्युत्तर दिले की ``राणी मेरी ही `राजा’ होती आणि ज्या अर्थी कोणत्याही राजाने केलेला कायदा – तो त्यानेच रद्द न केला तर – सदैव अस्तित्वात राहू शकतो, कारण इंग्लंडचा राजा कधीही मरत नाही. (The king of England never dies!) त्या अर्थी स्टब्स व त्याचे साथीदार यांना झालेली हस्तछेदनाची शिक्षा ही न्याय्य व कायदेशीरच आहे.’’
एलिझाबेथने एकदा एक ग्रंथ सर फ्रान्सीस बेकन यांजवळ परीक्षणार्थ दिला असताना, त्याने हुजूरच्या तडाख्यांतून त्या ग्रंथाचा बचाव फार मोठ्या युक्तीने केला. राणीने त्यास विचारले, ``या पुस्तकात कोठे राजद्रोह आढळतो काय?’’
बेकन :- राजद्रोह? यांत मला तर सारी चोराचोरी व दडपादडपी मात्र दिसत आहे. काय सांगू राणीसरकार, या पठ्ठ्याने टॅसिटस आणि सॅलस्टपासून तो आजपर्यंतच्या नामांकित ग्रंथकारांच्या ग्रंथांतील उत्कृष्ट भाग चोरून या पुस्तकांत कोंबले आहेत.
अशा युक्तिवादाने बेकनने तो ग्रंथ राजद्रोहाच्या संशयाच्या कचाट्यातून वाचविला. आर. हॉलिनशेड हा एक दांडगा इतिहासकार होता. याने इंग्लंड, स्कॉटलंड व आयर्लंड या देशाचे मोठे इतिहास लिहिले होते. पण करतो काय बिचारा! एलिझाबेथ राणीच्या दणक्याचे भूत रात्रंदिवस त्याच्या डोळ्यांपुढून हालेचना. शेवटी छाटछाटी, कापाकपी करून – खच्ची स्थितीतच का होईना! एकदांच्या त्या `हिस्ट-या’ त्याने प्रसिद्ध केल्या.
गाईल्स फ्लेचर या नावाचे एक इंग्रज गृहस्थ रशियात शिष्टाई करण्यास वकील या नात्याने गेले होते. ते तिकडून `स-मस्तक’ जिवंत परत आल्यावर, तिकडील अनेक जुलमी कृत्यांचा परिस्फोट करण्याच्या उद्देशाने, `The Russian Commonwealth’ या नावाचा एक ग्रंथ त्यांनी लिहिला. ही गोष्ट लंडनातल्या रशियन व्यापा-यांस कळताच, झाकलेली सव्वालाखाची मूठ आता उघडी होणार, या भीतीने त्यांनी एलिझाबेथकडे ब-याच सह्यांचा एक जंगी अर्ज सादर केला, आणि ते पुस्तक गर्भातल्या गर्भात ठार मारविले.
एलिझाबेथची कारकीर्द ही अशी होती. आता उलट तिस-या विल्यम राजाची कारदीर्द पाहा. छापखान्याला निर्भेळ पूर्ण स्वातंत्र्य असे याच्याच कारकीर्दीत मिळाले. `ग्रंथकार व त्याचा ग्रंथ यांमध्ये राजाची नुसती सावलीसुद्धा पडत नसे’ असे तत्कालीन इतिहासकारांनी स्वातंत्र्याचे वर्णन केले आहे. याच अमदानीत अशी एक गोष्ट घडून आली की, लॉर्ड मोल्स्वर्थ नामक एक इंग्रज वकील डेनमार्कच्या दरबारात होते. त्यांनी ``Account of Denmark’’ –डेनमार्कची काही माहिती – या आपल्या पुस्तकात खुद्द डेन्मार्कनृपतीबद्दल काही वरचढपणाचा मजकूर लिहिला. तेव्हा इंग्लंडातील डॅनिश वकिलाने ही गोष्ट खुद्द विल्यम राजाच्या कानावर घालून म्हटले, ``महाराज हीच गोष्ट आमच्या एकाद्या डॅनिश मनुष्याने जर आपल्याबद्दल केली असती, तर इंग्लंडच्या नृपतीची नुसती सूचनात्मक तक्रार येताच, त्या मनुष्याची मान तत्काळ फासावर लटकली गेली असती.’’ यावर त्या स्वातंत्र्यप्रिय स्वतंत्र लोकांच्या नृपतीने शांतपणाने उत्तर दिले, ``वकीलसाहेब, गोष्ट वाईट खरी. पण आपण म्हणता तसे मात्र मला करता यावयाचे नाही. आपली मर्जी असेल तर आपण जे काय म्हणता ते सर्व मी त्यास स्पष्ट कळवितो आणि आपल्या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीत ही तक्रार जोडण्याची त्याला विनंती करतो.’’ एलिझाबेथ आणि तिसरा विल्यम यांच्या कारकीर्दीत पुरते शतकाचेही अंतर नव्हते, परंतु दोन दंडधारकांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनांत केवढे महदंतर?
पहिले जेम्स राजे जेव्हा सिंहासनाधिष्ठित झाले, तेव्हा प्रत्येक ग्रंथकाराने आपला ग्रंथ त्यांतील आक्षेपार्ह भागाची शुद्धी, तपासणी किंवा सुधारणा करून घेण्याकरिता सरकारकडे पाठविलाच पाहिजे, व असे न करणारास कडक शिक्षा ठोठावण्यात येईल, असा निर्बंध करण्यात आला. जॉन नॉक्स (John knox) – ज्याला मिल्टनने `राज्य सुधारक’ (The Reformer of a Kingdom) असे म्हटले; फार काय पण ज्याच्या थडग्यावरसुद्धा ``There lies he who never feared the face of man’ असे वाक्य खोदले गेले, - त्या स्फूर्तिदायक लेखकाच्या ग्रंथांतील मजकुराच्या तंगड्याही याच महापुरुषाच्या राजवटीत कापल्या गेल्या. याबद्दल मिल्टननेच म्हटले आहे की, ``रेचक्या परीक्षकांच्या हलगर्जीपणाच्या परंतु बुद्धिपुरःसर केलेल्या हिरवटपणामुळे अथवा काल्पनिक भीतीमुळे, प्रस्तुत ग्रंथकाराच्या ग्रंथांची जी छाटछाटी करण्यात आली, त्यामुळे भावी पिढी सदरहू लोकोत्तर मनुष्याच्या बुद्धिमत्तेचा स्वाद घेण्यास कायमच्या मुकल्या.’’
`लायसेन्सर्स ऑफ धी प्रेस’- किंवा छापखान्यावरचे अधिकारी – ही संस्था विशेषतः पहिल्या चार्लस राजाच्या अमदानीत व्यवस्थित अशी स्थापन झाली. म्हणजे या राजश्रीने छापखाना-संस्थेच्या नरड्यावर सदोदित बुटाची टाच ठेवणा-या संस्थेला चांगले व्यवस्थित असे कायदेशीर रूप दिले. अर्थात् जेव्हा खुद्द नृपतीनेच `लोकरंजना’चे आपले कर्तव्य झुगारून `आत्मरंजना’कडेच विशेष लक्ष दिले, तेव्हा राजनिष्ठेचा सफेदा फासून `नृपतिरंजन’ करणा-या `खास सरकारी आश्रयाखालील’ प्रकाशक लोकांचा एक वर्ग निर्माण झाला. राजाची व राजकक्षेतील भाग्यवान अधिका-यांची मर्जी प्रसन्न करून घेण्याकरिता त्यांना रुचेल व पचेल असली कायदेशीर व शुद्ध गाळीव मजकुरांची पुस्तके प्रसिद्ध करून, या प्रकाशकवर्गाने आपल्या पोळीवर तूप ओतून घेण्याची संधी वाया दवडली नाही.
याच वेळी छापखान्याच्या या विवक्षित गलचेपीमुळे. पार्लमेंटातील प्रेसब्रिटेरियन पक्षाला छापखान्याचे दरवाजे अगदीच बंद झालेले होते. त्यांच्या मतांना बाहेर पडण्याची मुळीच संधी मिळत नसे व उलट प्रतिपक्षांच्या टीकांचा मारा त्याना निमूटपणे मूग गिळून सहन करावा लागे. तेव्हा मानवी विचार-व्यक्तिकरणावर असलेले लायसेन्सरचे हे भूत अजिबात नष्ट व्हावे, छापखाना राजकीय दडपणापासून मुक्त व्हावा, वगैरे चळवळ त्यांनी पाल्रमेंटात मोठ्या आवेशाने व जोराने सुरू केली. या वेळी प्रेसबिटेरियन पक्ष म्हणजे मानवी स्वातंत्र्याकरिता धडपणारा एक ईश्वरी अवतारच उत्पन्न झाला की काय, असा सर्वांचा समज झाला. परंतु हा समज नुसता `समज’च होता, हे लवकरच सर्वांच्या प्रत्ययास आले. कारण पार्लमेंटातील राजकारणाच्या `सीसॉ’च्या खेळात या या पक्षाचे पारडे वर होताच, त्याला स्वाधिकार-संरक्षणाची इतकी कडकडीत जाणीव उत्पन्न झाली की, त्याच्या पूर्वीच्या अधिकारसंपन्न प्रतिपक्षांनी छापखान्याच्या गळ्याली जी नुसती दोरी अडकवून ठेवली होती, तिच्याऐवजी या ढोंगी स्वातंत्र्यसंरक्षकांनी कडक तात अडकवून तिचा घट्ट फासही ओढून ठेवला! मानवी प्राण्यांचा राजकीय इतिहास म्हणतात तो हा असला असतो!!
इंग्रज लोक ज्याची महाकवीत प्रामुख्याने गणना करतात, त्या मिल्टन कवीचेही प्रेसआक्टाने काही थोडेथोडके वाभाडे काढले नाहीत. राजसत्तात्मक व प्रजासत्तात्मक अशा दोनही प्रकारच्या राज्यव्यवस्थेने बिचा-या मिल्टनास सुके सोडले नाही. त्याने आपल्या का इतिहासात सॅक्सन भिक्षु लोकांच्या धर्मभोळेपणाबद्दल, गर्वाबद्दल आणि लुच्चेगिरीबद्दल काही सणसणीत टीका केली होती. ती राजकीय दुसरा चार्लस राजा व बिशप लोक यांच्याविरुद्ध आहे असे ग्रंथ रेचक्यास वाटल्यामुळे, रेचकविधीत तेवढा मजकूर साफ गाळण्यात आला. मिल्टन ज्या प्रजासत्ताक राज्यपद्धतीचा मोठा भक्त होता, त्या पद्धतीच्या अमदानीतही त्याला असलाच त्रास झाल्याशिवाय राहिला नाही. ``History of long Parliament and Assembly of Divines’’ या त्याच्या पुस्तकातील कित्येक भाग सन १६७०त आक्षेपार्ह ठरवून वगळण्यात आले होते. परंतु पुढे सन १६८१मध्ये किंचित् मनु बदलला म्हणून म्हणा, किंवा दृष्टिकोन बदलला म्हणून म्हणा तेच आक्षेपित भाग स्वतंत्र प्रसिद्ध केल्यावर सर्वांनी मिटक्या मारीत वाचले. पॅरडाईज लॉस्ट काव्याच्या पहिल्या पुस्तकात मिल्टनने सॅटनचा उदयोन्मुख सूर्याशी जो उदात्त दृष्टांत दिलेला आहे, तो देखील अप्रत्यक्ष रीतीने राजद्रोहप्रचारक ठरवून अजिबात गाळण्याची घोरपड त्या महाकाव्याच्या बोकांडी बसली होती; परंतु ती थोडक्यात निभावली.’
वरील माहितीवरून ``वाङ्मयात्मक जुलूम’’ आजपर्यंत कसा काय होत आला आहे आणि लोकोत्तर बुद्धिमंतांच्या शुद्ध ज्ञानास्वादाला जग कसकसे मुकत गेले, हे कळून आलेच असेल. त्याचप्रमाणे या जुलमाची आपल्या क्षेत्राबद्दलची दृष्टी किती आकुंचित आहे आणि त्याच्या समर्थनार्थ जे जे उपाय आजपर्यंत योजत आले, ते ते उलट त्या जुलमी पद्धतीच्याच उरावर कसे बसले. हेहि समजलेच असेल. आता, फक्त प्राचीन `लायसेन्सर’ [किंवा जे अलीकडे `सेन्सॉर’ या उपाधीने ओळखले जातात,] यांच्या हातून ग्रंथपरीक्षणाच्या कामात ज्या मूर्खपणाच्या हास्यास्पद अशा गोष्टी घडल्या, त्यांचेच दिग्दर्शन करावयाचे राहिले आहे. परंतु शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने, या बाबतीत विशेष काही लिहिलेच पाहिजे असे नाही. लायसेन्सरच्या अधिकारावर नेमलेले लोक किती अजागळ आणि सर्वसामान्य अकलेच्या बाबतीतही पोकळ असतात, याचे विवेचन मिल्टनने आपल्या ``The liberty of unlicensed printing.’’ या लेखात केलेच आहे.
असो. सध्या हिंदुस्थानात प्रेस-आक्टाची जी अमंवबजावणी चालू आहे, तिच्या पद्धतीत आणि प्राचीन लायसेनसिंग किंव इंक्विझिशन पद्धतीत विशेष काय फरक किंवा सुधारणा आहेत, हे सांगणे जरा धाडसाचे होईल. म्हणून इंग्रजी राष्ट्राचा अत्यंत आवडता इतिहासकार व तत्त्ववेत्ता डेव्हिड ह्यूम (David Hume, 1711-1776) याच्या एका इषा-यानेच आमच्या निबंधाचे भरतवाक्य करून हा लेख आटोपतो. तो इषारा हाच की –
``The liberty of Britain is gone for ever, when such attempts shall succeed.’’
चित्रमय जगत्, एप्रिल १९१८
लेख ६
लोकसंग्रह आणि राजकारण
मतामतांचा गलबला सर्वत्र माजून कोणी पुसेना कोणाला अशी स्थिति झालेली असली, तरी देशातील विविध चळवळींच्य नाडीवर हात ठेवताच, कोणीही झाला तरी हेच सांगेल की हिंदुस्थानात एक अद्भुत नवचैतन्याचे वातावरण उत्पन्न झाले आहे खरे. अग्नि ज्याप्रमाणे छपविता येत नाही, त्याप्रमाणे नवचैतन्याचा स्फुल्लिंगही झाकला जात नाही. आजचे भारतीय प्रबोधन अक्षरशः न भूतो न भविष्यति असेच आहे. त्यात चालू घटकेला असावा तितका संघटितपणा व एकसूत्रता जरी नसली, तरी राष्ट्रजीवनाच्या बॉयलरमध्ये चैतन्याची वाफ सणसणाट करू लागली आहे, ही गोष्ट काही असमान्य नव्हे, येईल, असाही एक असामान्य सूत्रधार-ड्रायव्हर- येईल को जो आम्चा राष्ट्राच्या पुनरुज्जीवनाची मेलगाडी संघटितपणाच्या साखळ्या जुळवून, एकसूत्री रेलवरून बेछुट दामटीत नेईल. भारतवासी सा-या जगाचे हमाल आहेत की, न तु एव आर्यस्य दासभावः (आर्यजन कधीही कोणाचे गुलाम होणार नाहीत) हे आमच्या आर्यचाणक्याचे सूत्र अक्षरशः खरे आहे, हे सा-या उपलब्ध जगाला ठासून सांगण्याचा सोन्याचा दिवस फार दूर नाही. सांप्रत भिन्न भिन्न मतवादी राष्ट्रसेवकांचे भिन्न भिन्न क्षेत्रांत `कुदळकाम’ (spade work) चालू आहे. भविष्यकाळी सा-या जगाला थक्क करून सोडणा-या भारतवैभवाच्यी ताजमहालाचा पाया भरण्याचे आज काम सुरू आहे. हा पाया पक्का करण्यासाठी अनेक राष्ट्रसेवकांच्या त्यात आहुति पडल्या, पडत आहेत व पडतील. ताजमहालाच्या भिंतीवर नक्षीचे किंवा घुमटावरील कळसाचे दगड होण्याऐवजी स्मृतींच्या तीक्ष्ण दृष्टिकटाक्षाला चुकवून आणि इतिहासाच्या चित्रगुप्ती रोजनिशीला चुकवून, ताजमहालाच्या पायात आत्मयज्ञ करणा-या अज्ञात खडबडीत दगडधोंड्याची पुण्याई फार श्रेष्ठ दर्जाची असते, हे विसरून चालणार नाही. सर्वस्वनाशाच्या सिमेंटात आत्मकर्तबगारीचा कणखर पथ्थर राष्ट्रकार्याच्या पायात निष्काम बुद्धीने, स्मृतीची पर्वा न करता, कोणाच्या ब-यावाईट सर्टिफिकेटाची दिक्कत न बाळगता, शुद्ध कर्तव्यनष्ठेने झुगारून देण्यातच कर्मयोगाची खरीखुरी सफलता असते. राष्ट्रोन्नतीच्या भिन्न भिन्न क्षेत्रात मतमतांतराचे दाट धुके पसरले असताही, प्रामाणिक भावनेने कार्य करणा-या सर्व हिंदी कर्मयोग्यांना ही एका दुर्बळ लेखकाची लेखणी शतशः प्रणाम करून उद्दिष्ट मुद्याच्या विवेचनाकडे वळत आहे.
लोकसंग्रह म्हणजे राष्ट्र-विराटपुरुषाचे हृदय. या पुरुषाच्या देहात सर्व प्रकारच्या चैतन्याचे रुधिराभिसरण हेच हृदय करीत असते. लोकसंग्रहाला राष्ट्राच्या आत्म्याची उपमा दिली तरी चालेल. हिंदुस्थान-राष्ट्राची लोकसंग्रही प्रवृत्ति जोपर्यंत धडधडत होती, तोपर्यंतच त्याच्या हातून विशेष पराक्रम झाला. हे धडधडणे बंद पडताच त्याच्या नाड्या आखडल्या, त्याचे वैभव फिके पडले. जीवनचेतना लुप्त झाली आणि तो प्रेतवत् बनला. धर्माने लोकसंग्रहाची शक्ति वाढवावी आणि त्य शक्तीने अखेर उपलब्ध जगाच्या राजकारणावर कुरघोडीची मात करावी, ही आर्यपरंपरा आहे. लोकसंग्रहाचे राजकारणाशी जरी निकटचे नाते असले, तरी धर्माचा लोकसंग्रहाशी जिव्हाळ्याचा रक्तसंबंध आहे. आर्यपरंपरा म्हणजे लोकसंग्रह आणि लोकसंग्रह ण्हणजेच आर्यपरंपरा, अशी इतिहासाची बिनतोड जबानी आहे. या परंपरेची निशाणी प्रत्येक हिंदुमात्राच्या गळ्यात असूनही, लोकसंग्रहाची कल्पना आमच्या गळी नीटशी उतरू नये, हा प्रचलित अवनति-अवदसेचा झपाटा होय. या निशाणीत नुसती लोकसंग्रही प्रवृत्तीच आहे असे नव्हे, तर राष्ट्रोद्धारार्थ आवश्यक लागणा-या `कॉलनायझिंग स्पिरिट’ वसाहतीच्या धाडसाचा मंत्रही आहे. पण लक्षात कोण घेतो? कोणत्याही कारणामुळे असो, आर्यजन बर्फमय उत्तर ध्रुवाचा प्रदेश सोडून दक्षिणेकडे वसाहत करण्यास निघाले खरे. पण जन्मभूमीचे प्रेम काही और असते. या प्रेमाची खूण आपल्याजवळ काही असावी म्हणून त्यावेळी दिसणा-या मृगशीर्ष नक्षत्राच्या आकारानुरूप (एक वर्तुळ व त्यातून निघणारा बाणाकृती दण्ड) आपल्या प्रवाशी पेशाला साजेल असे एक स्मृतिचिन्ह त्यांनी बनविले.
एक कमरपट्टा व हातात एक दण्ड. ज्याच्या कमरेला पट्टा व हातात दण्ड असेल तो आर्य, मग तो कोठूनही आलेला असो, त्याला आपला भाऊ मानून आर्यसंघात सामील करून घ्यायचा. या धोरणाने आर्यजनांनी आपला आर्यसंघ अवाढव्य वाढविला आणि वसाहती-धाडसाच्या जोरावर ते अखिल जगाचे शास्ते झाले. या कमरपट्याचे रूपांतर अखेर जानव्यात झाले आहे. आर्यलोक जात्याच व्यवहारकुशल असल्यमुळे त्यांनी हे कमरेचे जानवे खांद्यावर लटकविले आहे, तरी आमचे दुसरे आर्यबंधु पारशी यांची कस्ती अजून त्यांच्या कमरेशी मस्ती करीतच आहे. जानवे म्हणजे भटांच्या गुलामगिरीचे दावे नसून आर्यपरंपरेच्या `मिशनरी स्पिरिट’चे लोकसंग्रही बाण्याचे आणि वसाहती धाडसाचे अवशिष्ट डेमोक्रेटिक जिन्ह आहे. `भटा, तुझे वर्म काय? सुताचे जानवे.’ या सूत्रातले सूत पिंजण्याचे काम रिकामटेकड्या संशोधकांनी खुशाल करावे. परंतु जानव्याच्या इतिहासात भट मिळावयाचा नाही किंवा श्रेष्ठकनिष्ठपणा सापडावयाचा नाही. ज्याच्या गळ्यात जानवे तो आर्यवंशज हिंदू, त्यात कोणी वरिष्ठ नाही कनिष्ठ नाही. सर्वांचा दर्जा सारखा. सर्वहिंदुधर्माचे मिशनरी. लोकसंग्रह करून राजकारणाच्यालढाया मारमारे क्षत्रिय आणि व्यापारउदीमाचे लोण उपलब्ध जगाच्या कोनाकोप-यात नेऊन भिडविणारे धाडसी वैश्य. जानव्याचा हा प्रभाव हिंदुजन जर नीट ध्यानात घेतील, तर रात्रंदिवस हृदायवर रुळणा-या या श्रुल्लक स्मृतिचिन्हाचा `मिशनरी’ बाण्याचा संदेश ते अतःपर फुका दवडणार नाहीत. जानव्याची गांठ ही कधीपासून `ब्रह्मगाठ’ बनली कोण जाणे, पण ती तत्त्वनिष्ठेची गाठ आहे, एवढे मात्र खचित. लोकसंग्रही मिशनरी बाण्याची ही तत्त्वनिष्ठेची गाठ प्रत्येक उपनीत हिंदू बटूस नीट समजावून देणारी पुरोहिताची परंपरा मागेच मेल्यामुळे, लोकसंग्रहाऐवजी केशवान्मा नाराणान्माची खडबडाटी कवायत अजागळाप्रमाणे हिंदू तरुणांच्या गळ्याला चिकटलेली आहे.
हिंदूंच्या प्राचीन वसाहतींचा इतिहास अजून मराठीत कोणी लिहिल्याचे ऐकिवात नाही. परंतु त्याचे उपलब्ध साहित्य पाहिले की, आमच्या आर्यपूर्वजांची मिशनरी धडाडी किती जबरदस्त आणि चिकाटीची होती, याची बरीच कल्पना होते. त्यांचा धर्म आताप्रमाणे एकलकोंड्या, क्षुद्रमनाचा, भेदाळु, तुसडा, तोंडपुंज्या, भिक्षुकी आणि घरातल्या घरात घरचीच माणसे जाळणारा नव्हता. कट्टा मिशनरी धर्म होता. त्याला अटकेची अटक नव्हती. हल्लींच्या हिंदूंना हाताच्या मुळीत आवळा धरता येत नाही, पण त्यांच्या आर्य बापजाद्यांनी पृथ्वीचा सारा गोल चिमटीत धरला होता. गौतम बुद्धाच्या मिशनरींनी नुसते आशिया युरपखंडच नव्हे, तर पाताळा लोकच्या अमेरिकेच्या मस्तकावर आर्यधर्माचे झेंडे फडकवून, तेथे आपल्या वसाहतीचे ठाणे ठोकले होते. त्यावेळी हा सिंधूदेश (हिंदुदेश) म्हणजे धर्माचे माहेरघर, आत्मज्ञानाची गंगा आणि विद्वत्तेची खास पेठ असा सर्वत्र लौकिक या मिशनरी चळवळीनेच प्रस्थापित केला होता. प्लेटो लायकरगस सारखे ग्रीक लोक तत्त्वज्ञानाचा श्रीगणेशा येथूनच शिकून गेले. जीझस क्रैस्ट याने आत्मज्ञानाची बाराखडी येथेच धूळपाटीवर घोकली. त्यावेळी काशी म्हणजे जगाची विलायत. झोरास्टर येथेच बुद्ध झाला. ज्याला शिकणे विद्या खाशी, त्याने उठून गाठावी काशी, हा काशीचा त्या वेळचा लौकिक. आता आमचे गाडे पहावे तर अगदीच न्यारे! ज्याला व्हायचे असेल कैलासवाशी, त्याने चटकन गाठावी काशी. पूर्वी ज्ञानसंपन्न होण्यासाठी परदेशाचे लोक काशीला येत; हल्ली हिंदू जन मरायला काशीला जातात! उन्नति व अवनति यात केवढा हा भेद!!
हिंदू जेव्हा या लोकसंग्रही बाण्याला पारखे झाले, तेव्हाच त्यांच्या सर्वांगीण गुलामगिरीचा पाया घातला गेला; तेव्हाच त्यांच्यात आपपरभेद उत्पन्न झाला; तेव्हाच त्यांच्या मर्मावर इस्लामी चांदता-यावर वज्रप्रहार पडला आणि पाठोपाठ क्रिस्ती पारध्यांची जाळी त्यांच्या हातापायत अडकली. हिंदू धर्माचा `प्रोझिलिटायझिंग बाणा’ (येईल त्याला, सापडेल त्याला, वाटेल त्याला हिंदूधर्माची दीक्षा देऊन हिंदू संघात घेणे) जर शिथिल न पडता, हिंदु धर्म म्हणजे भिक्षुक मर्कटांच्या हातचा लोण्याचा गोळा न बनता आणि स्मृतिपुराणादि भिक्षुकशाही ग्रंथातील द्वैती भावनांना हिंदुसमाज अनाडी बोकडाप्रमाणे बळी न पडता.
तर इस्लामी चांदता-याची नागवी समशेर खैबर घाटातल्या घाटात बोथट पडली असती आणि आकाशातल्या बापाच्या लेकांची जहाजे आरबी समुद्रात उलथीपालथी झाली असती. असती आणि नसती! आम्हालाच आली अहंपणाची मस्ती, इतक्यात परक्यांनी जिंकली कुस्ती, पण आता तरी सोडू या कुंभकर्णाची सुस्ती!!
हिंदुजनांनी लोकसंग्रहाचे तेरावे घातले तर घातले, पण निदान संघरक्षणाची तरी काळजी घ्यावी? तेही नाही. परकीय मिशनरी जाळ्यात कोणी गेलाच तर `जा मर, काळे तोंड कर’ असला उद्दामपणा. त्याला परत जवळ घेण्याची बोली नाही. या उर्मटपणाचा परिणाम असा झाला की ११व्या शतकापर्यंत ज्या हिंदुस्थानात मुसलमान औषधाला मिळण्याची पंचाईत, तेथेच आज एक दोन नव्हे तर सहा कोटी मुसलमान उत्पन्न झाले. हे काय आकाशातून पडले की इराण तुर्कस्थानातून त्यांची पार्सले भरून आली? खुद्द इराण, आरबस्थान व तुर्कस्थान या इस्लामी राष्ट्रात मुसलमान फक्त अडीच तीन कोटी आणि हिंदुस्थानात सहा कोटी? अर्थात हे सहा कोट जीव आमच्याच हाडारक्तामांसाचे पूर्वी हिंदूच होते. आमच्या अधार्मिक उद्दामपणामुळे ते आज आम्हांपासून धर्माच्या विरळ पडद्यामुळे विभक्त पडले आहेत व लोकसंग्रहदृष्ट्या केलेली ही चूक राजकारणाच्या क्षेत्रात आज आम्हाला पदोपदी नुसती अडवीतच नाही, तर रडवीत आहे. मुसलामानी धर्माची डिमॉक्रसी आणि हिंदु धर्माची प्रोस्टाक्रसी यांचा विस्तृत तुलनात्मक इतिहास हिंदू धर्माचे दिव्य या पुस्तकाद्वारे आम्ही सन १९१९ सालीच हिंदु बांधवांपुढे मांडलेला असल्यामुळे, त्याचा पुनरुच्चार येथे करीत नाही व करणे शक्यही नाही. तथापि एक गोष्ट सांगितल्यावाचून राहवत नाही. हिंदुजनांनी `जा’ म्हणून धिक्कारलेल्या बाट्यांनीच हिंदू राष्ट्राचा गळा विशेष कापला आहे, ही एकच गोष्ट जर हिंदुजन नीट विचारात घेतील तर लोकसंग्रह आणि पतितपरावर्तन या बद्दल कसला वादच राहणार नाही. मलिक काफूर, मलिक खुस्रू, मकबुलखान, मुजफरखान, सुलताना शिकंदर लोदी, निजाम उल्मुक बहिरी, अहंमद निजामशहा, फतेउल्ला इमादशहा, महाबतखान, इत्यादी बडीबडी ठळक मंडळी हिंदू धर्मातून मुसलमान धर्मात गेली; पण त्यांनीच हिंदू धर्माला चारी मुंड्या चीत करण्याच्या कामी केवढाले अत्याचार केले व राजकारणातही हिंदुंना किती नामोहरम केले त्याचा इतिहास पहा. पुरुषांप्रमाणे बाटलेल्या अनेक स्त्रियांनीही हाच धडा गिरवल्याचे आढळून येईल. हिंदुस्थानातील मुसलमानी सत्तेचा इतिहास म्हणजे लोकसंग्रहाच्या जोरावर राजकारणी लढाया मारून हिंदुंना नेस्तनाबूद करणा-या मिशनरी बाण्याचा यशस्वी इतिहासच म्हटला पाहिजे.
आता हे चित्र पहा. `क्रिश्चन पेट्रिअट’ नामक हिंदी हिंदी वर्तमानपत्राचे हे मुखचित्र आहे. याचा अर्थ काय? वाचक हो, नीट निरखून पाहा. या चित्राचा अर्थ, क्रिश्चन पेट्रिअट पत्राची महत्त्वाकांक्षा, अशी आहे की `काय वाटेल ते होवो, आम्ही सर्व हिंदुस्थान क्रिस्तीस्थान करू.’ A day will come when the last Hindu is baptized (असा एक दिवस येईल की त्या वेळी अगदी शेवटचा शिलकी हिंदू आम्ही क्रिस्ती करू.) अशी तर क्रिस्ती मिशनर-यांनी पैज मारलेली आहे. हिंदी क्रिस्ती संस्थांच्या नानाविध चळवळींसाठी दरसाल अमेरिका, इंग्लंड येथून कोट्यवधी रुपयांचे फण्ड बिनचूक येत असतात. एवढी ही संपत्तीची उधळपट्टी करणारे इंग्लिश व अमेरिकन लोक असे काय मोठे कर्णाचे अवतार लागून राहिले आहेत की `फक्त ख-या धर्माचे ज्ञान’ देण्यासाठी त्यांनी मोठमोठ्या चळवळी येथे चालवाव्या! ख-या धर्माचे ज्ञान न मिळता, हिंदुस्थानातले लोक स्वर्गाला जाण्याऐवजी नरकात गेले, तर या बेट्यांना थोडेच सुतक येणार आहे? क्रिस्ताचा जन्म होण्यापूर्वी आणि हे क्रिस्ती कर्ण आपले काळे पांढरे झगे घेऊन इकडे येण्यापूर्वी अनंत कोटी आर्य `ख-या धर्मज्ञानाच्या’ तुंब्याशिवाय वैतरणी नदीत बुडून मेलेच की नाही? तसेच त्यांचे आधुनिक वंसजही येथे मरून पुन्हा `वन्समोअर’ वैतरणीत बुडून मरतील; त्याची यातायात या क्रिस्ती गोमागणेशांना कोणी सांगितली? पण हिंदुस्थान क्रिस्तीस्थान करण्यासाठी त्यांच्याजिवाची कोण आटापिटी चाललेली असते ती पहा. आणि आम्हा हिंदुजनांची ही स्थिती पाहा.
इतक्या कोट्यवधी डॉलर पौंडांचे केवळ धर्मासाठी शेण करम्याइतके इंग्लिश अमेरिकन लोक आजच गाढव बनले काय? खचित नाही. यात धर्मप्रसाराच्या दाट कवचाखाली, राजकारणी गूढ डावपेच आहेत. हिंदुलोकांना स्वर्गप्राप्तीचा सुलभ मार्ग दाखवून, वरती वाटखर्चासाठी पॉकेटमनी पाव बिस्कुटे देण्यासाठी काही ही क्रिस्तसेना येथे आलेली नाही खास. परंतु अजून आम्हाला त्यांच्या मयचेष्टेचा पुरा थांग लागलासा दिसत नाही. हिंदुस्थानात क्रिस्ती चळवळ करणारे क्रिस्ताचे लाल पाहिले तर सारे बाटे हिंदुच. येथेही पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती पाहून घ्या. तुमच्याच हातून तुमच्याच थोबाडीत भडकवायची! परदेशी-परधर्मी माणूस पत्करतो, पण स्वदेशी-परधर्मी पत्करत नाही. हिंदु राष्ट्राचा घात सर्वतोपरी याच बाट्यांनी विशेष केला आहे. विशेष केला आहे, विशेष केला आहे, असे किती वेळा लिहावे? सारांश, परधर्मात जाणारा प्रत्येक इसम म्हणजे तेवढी आमच्या हितशत्रूंच्या सैन्याची भरती, नवीन कट्ट्या सत्रूची उत्पत्ती, आणि तितकीच आमच्या संघाची अधोगती, एवढे तत्त्व जर सर्व हिंदुंच्या गळी उतरले, तर पतितपरावर्तन करायचे त्याला हिंदु मिशनरी सोसायटीचा विधि घ्यावा, डॉ. मुंज्यांचा देवलोक्त विधि घ्यावा की कुर्तकोटींना आणखी एखादा नवीन तर्कटी विधि शोधून काढण्यास सांगावा, असले ऐदी बाष्कळ व निरुपयोगी दिवाणखानी वाद घालणारांना शरमच वाटेल.
धर्मद्वारा लोकसंग्रह आणि लोकसंग्रहाद्वारा राजकारण, या त्रिदळी तत्त्वाचे महत्त्व उमजून, हिंदुंच्या संघशक्तीचा परधर्मप्रवेशाने होणारा –हास, उत्तरेच्या बाजूने थोपवून धरण्याचे राष्ट्रकार्य महर्षि दयानंद सरस्वती यांनी केले; आणि दक्षिणेकडे बोकाळलेल्या विधर्मी क्रिस्त्यांच्या थैथयाटाला तोंडबेडी चढविण्याचे पुण्यकार्य चिरंजीव आद्य हिंदुमिशनरी गजानन भास्कर वैद्य यांनी केले. स्वामी दयानंदांच्या आर्यसमाजाची कामगिरी अद्भुतरम्य आहे. त्यांच्या लोकसंग्रही कामगिरीचे परिणाम इतके सर्वस्पर्शी व परिणामकारक झाले की आर्यसमाजावर क्रिस्ती मिशन-यांनी अनेक संकटांच्या घोरपडी आणल्या व त्यांच्या बदलौकिकाचा (?) खोटानाटा डंका सर्वत्र पिटून, त्याला अनेकवेळा सरकारच्या क्रुद्ध अवकृपेच्या प्राणघातक दिव्यांतून कित्येक वर्षे जीवनयात्रा कंठण्यास भाग पाडले. पण धन्य ते आर्यसमाजाचे अनुयायी, त्यांनी या भयंकर दिव्यांत आपली जान दिली पण समाजाची मान दिली नाही. वाचकांनी विशेष माहितीसाठी लाला लजपतरायनी लिहिलेले `आर्यसमाज’ हे इंग्रजी पुस्तक मुद्दाम एकवार वाचावे, अशी शिफारस आहे. एकट्या लाला लजपतरायनी आठ हजार लोकांना आर्यसंघात समाविष्ट करून घेतलेले आहे. कै. वैद्यांची हिंदू मिशनरी सोसायटी अजून बाल्यावस्थेत आहे. तथापि तिच्या पाच वर्षांच्या कामगिरीने महाराष्ट्रात मिशनरी तत्त्वाची बरीच जागृती झाली आहे व अजमासे शंभर जिवांना हिंदुधर्माची दीक्षा देऊन हिंदुमहासंघाची सेवा बजावलेली आहे. कै. वैद्यांची कामगिरी पाहू इच्छिणारांनी हिंदु मिशनरी साप्ताहिकाच्या फायलीच वाचलेल्या ब-या. त्यांनी लिहिलेल्या १९४ अंकांत हिंदु मिशनरीविषयक सर्व सिद्धांतांचे स्पष्ट निरूपण करून ठेवलेले आहे. वैद्यांची लेखनशैली त्यांच्या प्रेमळ भाषणशैलीप्रमाणेच अत्यंत बाळबोध आहे. त्यांची सामाजिक सुधारणेची मते प्रत्येक तरुणतरुणीने अवश्य स्वाध्यायात आणावी, अशी कळकळीची प्रार्थना आहे. हिंदुमिशनरी सोसायटी फक्त कार्याकरिताच कार्य करणारी संस्था आहे. तिच्यापाशी फंडही फारसा नाही. वैद्यांना फंडाचा फार तिटकारा असे. ते म्हणत, ``हे धर्माचे कार्य. वाटेल त्याने वाटेल तेव्हा वाटेल तेथे करावे. त्याला फंड कशाला? नको आम्हाला ते विष.’’ या सोसायटीची स्थापना शुद्ध मतस्वातंत्र्यावर झालेली असल्यामुळे काषायवस्त्रधारी भिक्षुक यांच्या इभ्रतीचा चरफडाट होत असतो. अधिकारी व अनधिकारी या भेदाचाच वैद्यांनी नायमाट केला आणि `हा अधिकार आम्हाला देवाने दिला’ असा खडखडीत जबाब ऐदी आक्षेपकांच्या मुस्कटावर झुगारून, त्यांनी छातीठोकपणे कार्याची प्रत्यक्ष सुरुवात केली व आपल्या हयातीच्या अखेरच्या ३।। वर्षांत त्यांनी हिंदु मिशनरी कार्याचा डंका केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर थेट अमेरिकेपर्यंत गाजविला. संस्थेच्या स्थापनेच्या दिवशीच मुंबईच्या एका उत्तुंग सत्ताधीशाने विलायतेला तार ठोकली की `आज ही संस्था सूक्ष्म रूपात आहे, अनपकारी (Innocent) आहे, पण हिच्या कार्याचे परिणाम कालवशात् दूरदूरवर भिडणारे (Far-reaching) आहेत.’
हिं. मि. सो. ला म्हणण्यासारखे स्वकीयपरकीय विरोधाचे तोंड लागलेले नाही. वैद्यांनी अनेक आक्षेपकांच्या आक्षेपांचे चुरचुरीत खंडन केलेले आहे. परंतु त्या नुसत्या वादक्षेत्रांतल्या कवायती चकमकी. आर्यसमाजाप्रमाणे या संस्थेला तापल्या तव्यावर अजून उभे राहावयाचे आहे. उकळत्या तेलात तळून घ्यावयाचे आहे आणि विरोधाच्या निखा-यांवर तिचे पापड अजून भाजले जावयाचे आहेत. ही दिव्याची देणगी देण्याचा अग्रमान वाटे क्रिस्ती, क्रुद्ध भिक्षुक, अवमानित हिंदु पुढारी, पैशापासरी झालेले शंकराचार्य किंवा माबाप सरकार यांपैकी कोण घेतो, हे भविष्यकाळ सांगेल. तथापि भिक्षुकशाहीच्या खडावा चाटून पन्नास हजारी फंडावर उभा राहू पाहणारा डॉ. मुंज्यांच्या कुर्तकोटी चळवळीचा बोलघेवडा मुंडोबा हा अग्रमान मिळवील, असे दिसत आहे. हा मुंजोबा भिक्षुकशाही छत्राखाली नाचू पाहत असल्यामुळे, या चळवळीचा आरडाओरडा पर्वतीवरच्या नगा-याप्रमाणे काही काळ दाही दिशा धुंद करील, यात संशय नाही. पण त्यामुळे निरपेक्ष बुद्धीने कार्य करणा-या संन्याशी हिं.मि.सो.ची लोकसंग्रही ध्वजा जोराने फडफडली तरी कडकडणार नाही खास. `हे कार्य देवाचे आहे. देव वाट दाखवील तसे जाऊन, अनुभव घेऊन आणि मुकाट्याने कार्य करीत राहू.’ हे वैद्यांचे उद्गार त्यांच्या संस्थेच्या कौन्सिल बोर्डाने सतत नजरेपुढे ठेवलेले आहेत.
हिंदी राजकारणाच्या जहाजाच्या बुडाशी अनंत भोके पडली आहेत. जहाजावर कप्तान कमांडर लास्करांची बरीच धामधूम उडाली आहे. तथापि ही भोके लोकसंग्रहाच्या काँक्रीट सिमेंटांनी बुजविण्याचा यत्न न करता, जहाज जर तसेच हांकारण्याचा बेमुत्सदपणा कोणी करी, तर मोठा घात होण्याचा संभव आहे, हे आमच्यासारखा राजकारणाभिज्ञ लेखकाने सांगावे असे नाही. लोकसंग्रहात ज्या ज्या बाबींचा सावेश होतो, त्या बाबी त्या राष्ट्रधुरीणांच्या नुसत्या ओठांवर न नाटता पोटात उतरून प्रत्यक्ष कृतीत त्यांचा परिपाक होईल, तोच निदान आम्ही स्वराज्याचा उषःकाल मानू; एरवी कदापि नव्हे. लोकसंग्रह हा राजकारणाचा आत्मा आहे, हे पटल्यावर अस्पृश्योद्धार, जातिभेदनिरास, धार्मिक समान दर्जा, इत्यादी गोष्टी प्रत्यक्ष राजकारणी उलाढालीपेक्षा किती महत्त्वाच्या आहेत, हे निराळे सांगणे न लगे.
होवो जगाचा गुरु आर्यधर्म ।
देवा जगी वाढवी हिंदुधर्म ।।१।।
[लोकमान्य मासिक धुळे]
लेख ७
पावनखिंडीचा संदेश
महाराष्ट्राचा इतिहास १७व्या शतकातला मराठ्यांचा इतिहास म्हणजे जगातला एक अद्वितीय चमत्कारच होय. या चमत्काराच्या पोटी मराठ्यांच्या पराक्रमांनी महाराष्ट्रातल्या अणुरेणूत त्याच्या भाग्योदयाचा दिव्य संदेश साठवून ठेविला आहे. महाराष्ट्राचा सह्याद्री, त्याची ती नवरसात न्हाऊन निघालेली खिंडारे – द-याखो-या, काळाशी टक्कर देऊन ताठ छातीने अजून उभे असलेले ते रायगड, प्रतापगडादी किल्ले, शिवरायाचे पुण्य स्मरणगान गुणगुणणा-या त्या कृष्णा, वेण्यादि नद्या आणि देशाच्या भाग्योदयार्थ शिवाजीच्या इमानी मावळ्यांनी आपल्या जिवाची तमा न बाळगता शुद्ध कर्तव्य-निष्ठेने घडाघड उड्या कशा घेतल्या, हे आजही प्रत्यक्ष कृतीने दाखविणारे ते खंडाळा घाटातले प्रचंड धबधबे, महत्त्वाकांक्षी तरुणतरुणींना, पाताळयंत्री राजकारणपटूंना, कर्मयोगी समाजसुधारकांना, किंवा उदारमनस्क धर्ममार्तंडांना, सर्वांना सबसारखा स्फूर्तीचा संदेश द्यायला आजही सिद्ध आहेत. जन्माला येऊन आपल्या मायदेशाच्या इतिहासात आपले नाव – एखाद्या कोप-यातच का होईना - `एक कर्तबगार मनुष्य’ म्हणून कोरले जावे, देवाने दिलेल्या आत्मबलाचा आपण आत्मोद्धाराच्या द्वारेच जगदुद्धारासाठी अगदी कसोशीचा शिकस्त प्रयत्न करावा, आणि आपल्या इवल्याशा साडेतीन हात देहात सा-या जगाला चकित करणारे काय काय पराक्रम भरले आहेत त्यांचा पूर्ण विकास करावा, अशा ताज्या टवटवीत स्फूर्तीने भरारलेल्या हृदयाचा कोणीही तरुण कोठेही पाहील, तर दगडधोंड्यातूनही त्याला उत्तेजनाचे संदेश ऐकू येतील, तुफानी वा-यांचे झोत `शाबास वीरा’ म्हणून त्याची पाठ थोपटतील आणि कडकडाट करणा-या आकाशगामी विद्युल्लता त्याच्या मार्गात आड येणा-या अडचणींचा चक्काचूर करतील. असल्या तरुणाला पावनखिंडीचा संदेश खात्रीने ऐकू आलाच पाहिजे. छातीचा कोट करून, कर्तव्याच्या निश्चित रोखाने पुढ सरसावणा-या प्रत्येक उमेदवाराला पावनखिंडींचा संदेश उत्साहवर्धक होईल, अशा भावनेने `किर्लोस्कर खबर’च्या मुखाने तो व्यक्त करीत आहे.
पावनखिंड आणि बाजी प्रभू देशपांडे ही दोन नावे एकमेकांत इतकी समरस झालेली आहेत, की पावनखिंड म्हणजे बाजीप्रभू आणि बाजीप्रभू म्हणजे पावनखिंड असे पर्यायशब्द आज रूढ होऊन बसले आहेत. बाजीप्रभूंनी पावनखिंडीला पावन केली, पावनखिंडीने बाजीप्रभूंचा उज्ज्वल पराक्रम उज्ज्वलतम केला, आणि या दोघांच्या संयुक्त स्मृतीत शिवशाहीच्या अनुपम पराक्रमाचा दिव्यात्मा केंद्रीभूत होऊन बसला. या आत्म्याचा संदेश काय आहे, हे एकदा स्पष्ट पटले की शिवशाहीच्या अभ्युदयाचीच केवळ नव्हे, तर महाराष्ट्राच्या भावी अभ्युदयाचीही किल्ली आपल्याला हस्तगत झाली असे समजावे. महाराष्ट्राचा अभ्युदय महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तिमात्राच्या पूर्ण विकासानेच झाला व पुढे होणार आहे, हे निराळे सांगावयास नकोच!
बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीच्या तोंडाशी आपल्या मूठभर मावळ्याच्या साहाय्याने विजापूरच्या प्रचंड इस्लाम सेनेचा धुव्वा कसा उडविला, शिवरायाला पाठीशी घालून, खिंडीच्या तोंडावर निधड्या छातीने तो कित्येक तास कसा लढला, आणि अखेर धारातीर्थी आत्मसमर्पण करून शिवाजीची बाजी त्याने कशी राखली, वगैरे हृदयभेदी परंतु स्फूर्तिजनक इतिहास आज अडीचशे वर्षे आबाल-वृद्धांच्या मनोवृत्तींना करुणरसाने रडवीत आहे, कर्तव्यनिष्ठेने डुलवीत आहेआणि उत्तान वीररसाने फुलवीत आहेत. अनेक जण अनेक दृष्टीने त्यातल्या प्रत्येक रंगाचा भडकपणा वर्णन करतात. राजकारणाभ्यासी जनांना त्यातून राष्ट्रप्रेमाचा संदेश घ्यावासा वाटतो. मुत्सद्यांना त्यांतली बाजीप्रभूची समयसूचकताच तेवढी आवडते. लढवय्यांना जात्याच उग्ररसाचे प्रेम विशेष असल्यामुळे, बाजीप्रभूच्या शरीरातून उडणा-या रक्ताच्या चिळकांड्यात, तरवारीचे वारांवर वार चालले असताना त्यांच्या चकमकीतून निर्माण होणा-या ठिणग्यात, आणि मावळ्यांच्या गोफणीने बेफाम रोंरावणा-या प्रभंजनातच त्यांना स्फूर्तीचे जिवंत झरे दिसतात. कोणी बाजीच्या शिवनिष्ठेची स्तुति करतो, कोणी त्याच्या राजनिष्ठेची महती गातो, कोणी त्याच्या शौर्याची कवने गातो, तर कोणी त्याच्या आत्मयज्ञावर कृतज्ञतेचा अश्रुवर्षाव करून, नानाविध विकारांनी तुड़ुंब भरलेल्या आपल्या हृदयाचा पाट फोडतो. असे हे नाना प्रकार आहेत. अर्थात आज दीपावलीच्या नवीन युगांतरात स्वावलंबनाच्या जोरावर आत्मोद्धाराचा किल्ला सर करण्यास सज्ज झालेल्या वीर वीरांगनांना –
किर्लोस्कर खबरच्या अनुयायांना
पावनखिंडीचा संदेश काय असावा? शिवरायाच्या घोडदळांनी तुडविलेल्या दख्खनच्या मैदानावरचा वाटेल तो दगडधोंडा गोटा उचलून त्याला कानांशी धरा, म्हणजे तो तुम्हाला हाच संदेश देईल, हाच मंत्रोपदेश करील आणि हीच हितगुजाची गोष्ट सांगेल की बाबांनो, तुम्हांला शिवबाप्रमाणे राष्ट्रोद्धार करायचा असेल, तर आधी आत्मोद्धार करण्याची लगबग करा; आणि आत्मोद्धाराचा योग साधा. आपले कर्तव्य – मग ते बरे असो वाईट असो, आवडीचे असो नावडीचे असो, स्वतः पत्करलेले असो – ते अक्कलहुशारीने, राजीखुषीने, मोठ्या कुशलतेने सफाईने पार पाडा. यालाच योग असे म्हणतात. हाती येणारे काम उत्तम रीतीने तडीस नेण्यातच महत्त्वाकांक्षी तरुणाच्या जीवनयशाचे आद्यबीज असते. पुष्कळ मंडळी अशी आढळतात की ते एखादे काम करतील, पण निष्काळजीपणाने त्यात एकच असा दोष ठेवतील की तेवढा त्या सर्व कामाची माती करायला पुरेसा होतो. कामे थातरमातर किंवा कशी तरी ओरबाडून करण्याची खोड एकदा का जडली की जडली. दारूड्याची दारू सुटेल, पण ती सुटत नाही. शिवाजीच्या एकाही मावळ्यात ही खोड नव्हती. त्याला वाटेल ते काम सांगा. टेहळणीचे काम असो, वकिलातीचे काम असो, एखाद्या बहुरुप्याचे असो, की कड्यावरून उडी घेण्याचे असो. काम जरूरीचे आहे, ते मला सांगितले आहे आणि ते मी केलेच पाहिजे, कारण योगः कर्मसु कौशलम. एवढ्या जाणिवेने शिवाजीचा प्रत्येक भक्त आपापले नियुक्त काम इतक्या मनोभावाने आणि सफाईने करीत असे की ते काम तडीस जाईल किंवा नाही याची शिवरायाला तिळमात्र काळजी उरत नसे. बाजीप्रभूने शिवरायाला म्हटले –
झडकरि आपण महाराज, या खिंडीतुनि जावें.
अपार शत्रुसेना ग्रासिल, क्षण न येथ रहावें.
मी धरतों हें नाक दाबुनी पावनखिंडीचें.
तोंवर जावें खुशाल घेउनि सैन्य मावळ्यांचे.
ठेवा निवडक कांहि मावळे माझ्या पाठीशी.
उभा राहतो असा इथें मी ठोकुनि छातीशीं.
आणि शिवाजीनेही त्यास प्रत्युत्तर दिले की, -
ठोकिन तोफा पांच पोंचतां रांगण किल्ल्याशी.
एवढ्या नुसत्या शब्दसंकेतावर पावनखिंडीचा इतिहास किती उज्वल रंगात रंगून निघाला बरे! यवनांना पुढे जाऊ देणार नाही, म्हणजे नाही; मेलो तरी नाही – नव्हे,
शिवरायाची तोफ जोंवरी पडे न मम कानीं.
तोंवरी आला काळ तरी त्या ठेंचिन लाथांनीं.
केवढी ही कार्यकुशलता आणि कार्यनिष्ठेतून सहजसिद्ध निर्माण होणा-या आत्मविश्वासाची तडफ! पाच तास तुंबळ युद्ध झाले. चार पाचशे मावळ्यांतून अवघे पन्नाससाठ उरले. स्वतःच्या शरीरावर मर्मस्थानी बारा प्राणघातक जखमा लागून देह रक्तात न्हाऊन निघाला. `इतक्या वेळात शिवाजी राजे रांगण्याला पोहोचले असतील, नाही का येईना तोफ ऐकू, चला जाऊ खिंड मोकळी करून. आता लढायचे तरी किती?’ असे एकाच्याही मनात आले नाही. कारण ते सर्व योगः कर्मसु कौशलम् मंत्राचे शागीर्द होते. ते शिवाजीचे भक्त होते. या भक्तांची कार्यकुशलता इतकी विलक्षण असे की पुरंदर लढविताना मुरार बाजीचे –
शीर उडाले तरी धड लढत होतें.
तीच अवस्था बाजी प्रभूची आणि त्याच्या इमानी मावळ्यांची. शिवबा राजांची पाच तोफांची सलामी ऐकू आल्याशिवाय पाऊल मागे घ्यायचे? छेः! मरण आले तरी जे मरणारे नव्हत, ते काय जखमांची पर्वा ठेवणार? अखेर तोफांचा दणदणाट उडाला आणि कार्यकुशल बाजी धारातीर्थी शांत झाला. बाजीप्रभूचे प्रेत शिवचरणाजवळ नेताच –
बळी दिला तूं तुझ्या जिवाचा केवळ मजसाठीं
राष्ट्रोन्नतिची जणूं वसविली कोणशिला मोठी.
या त्या राष्ट्रवीराच्या तोंडून निघालेल्या उद्गारात योगः कर्मसु कौशलम् या बीजमंत्राचाच अखेर ध्वनि निघाला. निघणारच. आत्मोद्धार असो वा राष्ट्रोद्धार असो, त्याच्या प्राणप्रतिष्ठेचा पाया याच मंत्रावर उभारलेला असतो.
अमेरिकेत गुलाम नीग्रो समाजाची उन्नती करणारे कर्मवीर बूकर टी. वॉशिंग्टन यांचे चरित्र पाहा. अजून कोणी वाचले नसल्यास मुद्दाम वाचा. योगः कर्मसु कौशलम् मंत्रानेच त्यांच्या अफाट नीग्रो समाजाचा अवघ्या पाव शतकात न भूतो न भविष्यति उद्धार झाला. बूकरला प्रथम एका शाळेत खोली झाडण्याचे काम मिळाले. `कुशलतेने काम करण्यातच खरा योग आहे व मी आज हे झाडूचे काम असे उत्तम करून दाखवितो की माझ्या धनिणीने माझी तारीफच केली पाहिजे.’ असा बूकरने निश्चय केला. `काम झाले का?’
प्रश्नाला `होय’ असे उत्तर मिळताच, त्या चाणाक्ष सेक्रेटरी बाईने आपला पांढराफेक हातरुमाल किंचित ओला करून त्याचे एक टोक दिवाणखान्यातल्या मेजावर घासून पाहिले, तो रुमालाला कसलाही डाग पडला नाही. बूकरने एखाद्या सांगकाम्याप्रमाणे दिवाणखान्याला नुसती झाडू मारून स्वस्थ न बसता, तेथली यच्चयावत् चीजवस्तू पुसून स्वच्छ साफसूफ केली होती. बुकरला तेथे नोकरी मिळाली व येथेच त्याच्या लोकविश्रुत आत्मोद्धाराच्या इतिहासाचा पाया बसला. सारांश, योगः कर्मसु कौशलम् हाच पावनखिंडीत उमटलेला श्रीकृष्ण भगवंताचा दिव्य संदेश, दिवाळीतल्या मिष्टमिष्ट पक्वान्नांबरोबरच जर खबरच्या वाचकवृंदाच्या गळी उतरून, त्याचा प्रत्यक्ष कृतीत परिपाक उमटेल, तर प्रस्तुत छोटेखानी लेखाने त्यांना ओवाळलेल्या आरतीची –
भाऊबीजेची ओवाळणी
या लेखणीला भरपूर मिळाली, असे ती मानील.
[किर्लोस्कर खबर, दिवाळी अंक, ऑक्टोबर १९२२]
लेख ८
फोनोग्राफचे व्याख्यान
(एका गुप्तसंचारी खास बातमीदाराकडून)
[स्पष्टवक्त्या पाटलाची झोपडी]
मु. निस्पृहनगर, ता. सणसणीत,
जि. टिकापूर,
ता. माहे सन (स्मरत नाही)
रात्रीची वेळ. ९-१०चा सुमार. गेल्या बुधवारचा दिवस. गावात नाटकाची साथ आल्यामुळे लोकांच्या झुंडीच्या झुंडी थियेटराकडे घाईघाईने चालल्या होत्या. पुरुषांच्या घोळक्यातच बायकाही आपापली मुले कशीबशी सावरीत, `चला बाई, पाय उचला. जागा मिळणार नाही. ठमाबाईचे न् माझे आटोपलेच होते, पण चिमाबाईचे सदान् कदा असेच रेंगाळणे’ वगैरे कुरबुर करीत धडपडत चालल्या होत्या. कित्येक फ्रीपासवाले `नाट्यकलेचे खरे रसिक आम्ही’ अशा घमेंडीत खिशातील पास हातात घट्ट धरून झुकत झुकत चालले होते. कित्येकजण `वाः! त्याची माझी केवढी ओळख! ओसाडपूरला तो न् मी ५ वर्षे एकत्र होतो. आता तो मॅनेजर झाला. बोलावलेय त्यांनीच. दरवाजावर या म्हणजे सोडीन म्हणाला.’ इत्यादि चलबिचल विकारात धावत होते. कित्येक आचारीपाणके कंपूचे मेंबर रात्री झकपक ड्रेस करून पिटचे ८४चे तिकीट काढण्यासाठी फक्त १ पैसा कमी आहे म्हणून आपल्या सवर्गीय स्नेह्यांची मनधरणी करीत डोक्यांवरील राजापुरी फेटा सावरीत चालले होते.
आमची स्वारीही त्यावेळी कुठे काही तरी नवीन बातमी मिळेल या आशेने कर्णरंध्रटेलिफोन साफसूफ करून नेत्रदुर्बिणीच्या काचा स्वच्छ पुसून कॉफीचा एक गरम कप झोकून नुकतीच बाहेर पडली होती. नाटकाला जावे, भजनाला बसावे की टँवटँव तारेवर चालणा-या लावण्या ऐकायला जावे, असा विचार करीत करीत सभ्यकुटाळक्लबाच्या इमारतीशी आलो. तो बातमी समजली की स्प,टवक्ते पाटलाला आज पुत्र झाल्यामुळे त्याने आज एक आनंदप्रदर्शक सभा भरविण्याचे धाडस केले आहे; इतकेच नव्हे तर दांतखिळीच्या कायद्याला सपशेल धाब्यावर बसविण्यासाठी त्या सभेत कोण्या मनुष्याचे व्याख्यान न होता एका फोनोग्राफचे व्याख्यान होणार आहे. ही विचित्र बातमी ऐकताच आमची स्वारी टेलिफोनच्या नळ्यांचे बिंडल सावरीत सावरीत थेट पाटलाच्या झोपडीतल्या गाईच्या गोठ्यात कडब्याच्या राशीवर विराजमान झाली. तेथे अनेक विभूती गोळा झाल्या होत्या. त्यांची नावे मी टिपून घेणार तोच अध्यक्षस्थानी विराजमान झालेल्या श्रीमती मेणबत्तीताईच्या बाजूला उभे राहून फोनोग्राफने आपले भाषण सुरू केले. वक्ते म्हणाले –
अध्यक्षादिक सभ्यगृहस्थहो! भगिनीहो! अहो, प्रेक्षकजनहो! आपण सर्व माझे भाषण ऐकण्याकरिता मोठ्या उत्सुकतेने या ठिकाणी आलात याबद्दल मी आपले फार फार आभार मानतो. वास्तविक पाहता, व्याख्याने किंवा वक्तृत्वकला आजपर्यंत मानवी प्राण्यांची जन्मदत्त वतनी जहागीर होती. परंतु दांतखिळीचा नवीन उपयुक्त कायदा अंमलात आल्यामुळे मानवी प्राण्यांच्या जिव्हेला काही काळपर्यंत पूर्ण विश्रांती मिळालेली पाहून जसा त्यांना आनंद होत असेल, त्याचप्रमाणे मनुष्यांची सर्व कामे करण्याची संधी आम्हा यंत्रादिकांना मिळाली याबद्दल मी त्या परमेश्वराचे अभिनंदन करतो. मी कोण आहे? हे आपल्याला सांगायला पाहिजेच असे नाही. कारण अध्यक्षबाई सुप्रसिद्ध श्रीमती मेणबत्तीबाई यांनी आपल्या स्वयंभू तेजाने ते आधीच सांगितले आहे.
माझा जन्म १९व्या शतकात झाला. प्रो. एडीसन यांच्या हस्ते माझे बालसंगोपन फारच उत्तम प्रकारे होऊन, मोठा होताच मी त्यांचा निरोप घेऊन पृथ्वीवरील अनेक देश पाहता फिरता फिरता या पाटलांच्या झोपडीत आज आलो. जगातील सर्व प्रकराच्या भाषा मला जरी मोठ्या सफाईने बोलता येतात तरी पण मी मनुष्य नव्हे. (शिंगाडा दाखवून) हा पहा माझा लांबलचक घसा नि हे माझे विशाळ तोंड! पहा, मला दात नाहीत. श्रोते हो, तुम्हाला दात आहेत. परंतु ईश्वरनिर्मित वनस्पतिजन्य, खनिज किंवा प्राणिज पदार्थांपैकी कोणी तुमच्या दातांच्या तडाक्यात सापडला तर त्यास तुम्ही चिरडून फस्त करायला बिलकूल सोडीत नाहीत. बुंधुभगिनींनो मला तसले घातकी दात बिलकूल नाहीत. परंतु तुम्हाला जसे तोंडाच्या आत काही दृश्य व गुप्त दात आहेत तसे मलाही काही गुप्त दात आहेत. त्या दातांचा उपयोग तुम्ही आपल्या शत्रुंची व शेजा-यापाजा-यांची हाडे कडकडा फोडण्याकरिता करता, तसा मात्र मी करीत नसून माझ्या पोटातील दातांचा एका सत्कार्यी उपयोग करण्यात येतो. माझे भाषण जसे पाहिजे तसे स्पष्ट उमटत नाही, कारण माझ्या तोंडात दात नाहीत. परंतु दंताडवाडी ओस पडलेल्या बोळक्या थेरड्याप्रमाणे मी बोबडे बोलणारा नाही.
या माझ्या लांबलचक घशाच्या बुडाशी मला एक लहानशी जिभली आहे. तुमच्याप्रमाणे मला लांबजीभ नाही. तुमची जीभ मात्र खरी पराक्रमी बुवा! तुमच्यात जे राजे आहेत किंवा सर्वसमर्थ म्हणून जे गणले जातात त्यांच्याच जिभेची का गोष्ट घ्याना? ती एकाद्याला क्षणात राव करील तर क्षणात रंक करून एका शब्दोच्चाराने वाटेल त्याला फासावर चढवील. मी स्पष्टच बोलतो, राग धरून नका की तुमच्या या लांबलांब जिभा प्राचीन वसलेल्या अफाट वैभवी शहराला एका मिनिटातच जाळूनपोळून खाक करण्यास समर्थ आहेत. तशी माझी जीभ नाही. इतकेच नव्हे तर घरचे खाऊन दुस-यांच्या टवाळक्या करीत दारोदार लांब लांब गप्पा झोडीत फिरणा-या तुमच्या मानवी छिनाल जिभेप्रमाणे माझी जीभ नाही. [सुशिक्षित `शेम शेम’ ओरडतात, अशिक्षित `शेण शेण’ ओरडतात आणि बाकीचे `पुंडलीक वरदा’ गर्जना करतात.]
मला कान मुळीच नाहीत. तेव्हा निंदास्तुतीमुळे उत्पन्न होणारा राग किंवा लोभ यांचे मला वारेही नाही. माझ्या तोंडात जे काही पडेल ते उमटविणे इतकेच माझे कर्तव्य आहे. त्याअर्थी दुस-याच्या सुखदुःखाचे आपले मस्तक उगीच न तापविणा-या सूज्ञ पंडितांप्रमाणेच मी सुखी व संतुष्ट असतो.
जंटलमेन अँड लेडीज! मी तुमचा फार वेळ घेत नाही. परंतु ज्याअर्थी ज्ञान द्वारे वक्तृत्वकलेच्या प्रसृत करण्याचे काम मानवी प्राण्यांपासून मानवी सत्ताधा-यांनी हिसकावून घेऊन आम्हा यंत्रवर्गाकडे सोपविले आहे, त्याअर्थी ते काम बजावणे माझे कर्तव्य आहे. असो. मी आता मूळ विषयाकडे वळतो. मला तुमच्या अंतःकरणाप्रमाणे कठोर अंतःकरण नाही. कारण ``तुम्ही आपली अंतःकरणे कठीण बनवू नका.’’ या ईश्वरोपदेशाच्या अनुमानाने मी आपल्या हृदयाची मृदुता ठेवली आहे. माझे हृदय फार नाजूक असून ते वितळणा-या मेणाइतके मृदू आहे. त्यावर घडविलेला गोष्टींचा ठसा फार त्वरित व स्पष्ट उमटतो. मानवी प्राण्यांच्या हदयाची कठोरता दिवसेंदिवस चढत्या कळेवर असलेली पाहून मला फार खेद होतो. [एक श्रोता `अरेरे’ म्हणून बेशुद्ध पडतो.]
तुम्हाला आवडेल ती भाषा मी वाटेल त्या वेळी बोलू शकेन. मी गाणेही गातो. तुमच्या हजारो जिभांपासून निघाले असंख्य ध्वनी मी एका जिभेने स्पष्ट उमटवीन. माझी लहर लागेल तेव्हा मी विनोदी बनतो, वाटेल तेव्हा हासतो किंवा आता झोडतो आहे तशी लेक्चरेही झोडतो. (टाळ्या व हंशा)
आवाज उमटविण्याचे मी यंत्र आहे, म्हणूनच माझ्या बापाने माझे नाव `फोनोग्राफ’ असे ठेविले आहे. श्रोतेहो! तुम्हीदेखील सर्व यंत्रेच आहात. ईश्वराचे शब्द तुमच्या अंतःकरण प्लेटीवर उमटविण्याकरिताच धार्मिक ग्रंथांतून ग्रथित करून ठेविले आहेत. त्यांचा ठसा नीट उमटून दाखवा. माझे काम मनपसंद करून दाखविण्यासाठी मी स्वतःला माझ्या धन्याच्या ताब्यात, त्याने मला नित्य स्वच्छ व पवित्र ठेवावे म्हणून जसे पूर्णपणे वाहून घेतले आहे, त्याचप्रमाणे तुम्ही जर आपल्या स्वतःला स्वर्गीय परमेशधन्याला वाहून घेतलेत तर स्वर्गप्राप्ती काही दूर नाही. हेच सत्य तत्त्व होय.
यानंतर टाळ्यांचा कडकडाट उडाल्यामुळे पुढचे भाषण मला ऐकू आले नाही. पण पुढे पाहतो तो वक्तेच खाली बसले. आता पुढील प्रकार लिहिण्यात काही अर्थ नाही. कारण टाळ्यांच्या कडकडाटाबरोबरच आमच्या कडब्यांच्या गंजीत उंदरांचा धडपडाट उडाला. त्यासरसे आम्ही तेथून गृहाप्रत गमन करते झालो. इत्यलाम्!
लेख ९
ऋग्वेद काळचे हिंदू
हिंदी आर्यांच्या प्राचीन इतिहासाचा शोध करण्याच्या कामी आजपर्यंत अनेक पौर्वात्य व पाश्च्यात्य विद्वान संशोधकांचे कनिष्ट प्रयत्न खर्ची पडलेले आहेत. या इतिहासाची कालभूमिका मानीव स्मृतीच्या कक्षेच्या पलीकडे आणि कल्पनाशक्तीच्याही क्षितिजापलीकडे असल्यामुळे, तिचे निर्णयात्मक स्वरूप निश्चित करण्याचे काम जरी गणिताच्या दृष्टीने यथातथ्य ठरविता येणे कठीण असले, तरी तत्कालीन आमच्या त्या पूज्य पूर्वजांच्या मनोवृत्तीचे बिंब ज्या ऋग्वेद नामक ग्रंथामध्ये चित्रित झाले आहे, त्यावरून त्यांची सामाजिक, राजकीय व धार्मिक चारित्र्याची ओळख आम्हास बिनचूक होते. या ऋग्वेदकालीन इतिहासाची कालगणना अजमासे किं. शं. पूर्वी २००० ते १४०० अशी ठरविण्यात आलेली आहे. अर्थात् ज्या विद्वान, धाडशी व द्रष्ट्या हिंदी आर्यांनी ऋग्वेदासारखा अवाढव्य ग्रंथ निर्माण केला; भाषालंकार, काव्यकौशल्य, स्फूर्तीची अत्युच्च भरारी, हृदयाच्या तळमळीचे आणि प्रसन्नतेचे प्रासादिक काव्यमय वाणीत होणारे अस्खलित पर्यवसान इत्यादि अनेक रंगांनी भरपूर रंगलेला ऋग्वेद रचला; आणि जगातील कोणत्याही काळच्या कोणत्याही वाङ्मयावर आपली विद्वत्तेची छाप कायमची ठेवून दिली, त्यांच्या या परिणतावस्थेचा काळ याच्याही पूर्वी अनेक शतके नेल्याशिवाय गत्यंतर नाही, हे कोणालाही कबूल करणे प्राप्त आहे. उदाहरणार्थ, इंग्रजांची आणि आमची पहिली मुलाखत १५व्या शतकाच्या सुरुवातीस झाली आणि त्यांच्या अचाट युक्तिसामर्थ्याची पहिली सलामी त्याच वेळेस झडली; म्हणजे इंग्रजांच्या इतिहासाची सुरुवात १५व्याच शतकात झाली असे म्हणणे केव्हाही सयुक्तिक दिसणार नाही. ज्या अर्थी इंग्रज लोक मोठ्या धाडसाने सप्तसमुद्रांचे उल्लंघन करून निवळ हातातल्या तागडीच्या जोरावर पूर्वेकडील प्रदेश काबीज करण्यासाठी या आर्यभूमीच्या किना-यावर येऊन दाखल झाले, त्या अर्थी देश काबीज करण्याची कला शिकण्यात त्यांच्या तागड्यांनी त्यापूर्वी काही शतके चांगलाच अभ्यास केलेला असला पाहिजे खास! तागड्यांची ही परिणती चांगली प्रगल्भ झाल्यावरच त्यांनी आपल्या तागड्यांची हालचाल केली, हे उघड आहे. हिंदी आर्यांबद्दल आपल्याला हेच अनुमान केल्याशिवाय ऋग्वेदात स्पष्ट नमूद असलेल्या त्यांच्या विविध पराक्रमाचा उलगडा आपणास होणार नाही.
ऋग्वेद हा आमच्या आर्यपूर्वजांचा ज्ञानकोश आहे. त्यांचा तो विस्तृत इतिहास आहे. त्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक अचाट पराक्रमाचा तो फोटोग्राफ आहे. आमच्या हिंदुधर्माचा उगम याच ऋग्वेद-हिमालयात झाला. सनातन हिंदुधर्माचे माहेरघर ऋग्वेद आहे. ह्या आमच्या आर्यपितरांचे मूळ वसतिस्थान उत्तर ध्रुवाच्या बर्फमय प्रदेशातले असो किंवा कॉकेशस पर्वताजवळच्या गोबीच्या अरण्यातले असो, ऋग्वेदाच्या काळी ते पंजाबचे जेते होते; सिंधुनद आणि तिच्या पंचनद्यांच्या शाखांतल्या प्रदेशाचे मालक व वसाहतवाले होते, ही गोष्ट उपल्बध इतिहासाने हडसून खडसून सिद्ध केली आहे. आमच्या धार्मिक, सामाजिक व राष्ट्रीय इतिहासाची सुरुवात अर्थात् आम्ही येथपासूनच गणली आहे. ऋग्वेदाची रचना करणारे हिंदी आर्य लढाऊ होते. त्यांच्यात एका प्रकारची नवजीवन शक्ति अपरंपार रसरसत होती आणि तिच्याच जोरावर ते उपलब्ध पृथ्वी पादाक्रांत करण्याच्या महत्त्वाकांक्षेने उसळत उसळत पंजाबपर्यंत येऊन ठेपले होते. स्वतःचे श्रेष्ठत्व, विशेष अधिकाराची लालसा, ते अधिकार जतन करून आणखी वृद्धिंगत करण्याची महत्त्वाकांक्षा, उद्योगप्रयितेची दांडगी आवड, उत्तमोत्तम सुखोपभोग भोगणारे हरीचे लाल सा-या जगात एकटे काय ते आम्ही आणि आम्हीच काय ते सत्ताधारी व इतर सारे आमचे दास इत्यादी ज्या उत्कट मनोभावना जेते लोकांच्या ठिकाणी स्वाभाविक व अनिवार्यच असतात, त्या त्य सर्वांचा या हिंदी आर्यांत पूर्ण मिलाफ झालेला आढळून येतो. ऋग्वेदातील ऋचांत त्यांच्या चारित्र्याचा जो विश्वसनीय व मुद्देसूद फोटोग्राफ उमटला आहे, त्यावरून त्यांच्या दणधाकट जोम, त्यांची शास्त्रीय बाण्याची तडफ, त्यांचा स्वाभिमानाचा कणखरपणा आणि लाथ मारू तेथे पाणी काढू असली आत्मविश्वासाच्या अत्युच्च भरारीची ईर्षा जितकी दृग्गोचार होते, तितकाच त्यांचा मनाचा मोकळेपणा, वृत्तीचा उदारपणा, हृयाचा प्रेमळपणा आणि राहणीचा साधेपणाही तितक्याच ठळकपणाने नजरेस पडतो. ऋग्वेद काळानंतरच्या आर्यांत जी एक प्रकारची संन्यासी एकलकोंडी आणि सहनशील प्रवृत्ती आपल्याला दिसून येते, तिचा या हिंदी आर्यांत किंचितही मागमूस लागत नाही.
उलटपक्षी धनधान्य, शेतीवाडी, घरदार, गुरे इत्यादि सांसारिक वैभवप्राप्तीच्या बाबतीत ते अत्यंत महत्त्वाकांक्षी असत आणि येथल्या मूळ रहिवाश्यांना युद्धात हतवीर्य करून त्यांच्या वसतिप्रदेशांवर झेंडे फडकविण्याच्या बाबतीत त्यांनी श्रमाची किंवा प्राणाची तमा बाळगली नाही.
मूळच्या रहिवाश्यांना भयंकर युद्धांत जिंकून त्यांना आपले दास करताना आणि नवीन नवीन प्रदेश काबीज करून आपल्या वसाहतीचे क्षेत्र वृद्धिंगत करताना हिंदी आर्यांची जेवढी करडी तडफ होती, तेवढीच निसर्गदेवतेचे निरीक्षण व अर्चन करण्यातली त्यांच्या हृदयाची मृदुलताही विलक्षण होती.
ऋग्वेदात हिंदी आर्यांचे निसर्गावलोकन व निसर्गपूजनप्रेम जितके अत्युत्कट दिसून येते, तितकेच त्यानंतरच्या काळातील कोणत्याही देशातील महाकवींच्या काव्यात आढळून येत नाही. निसर्गातला उज्वल, हृदयस्पर्शी, चित्तोन्मादक असा कोणताही देखावा त्यांच्या दृष्टीस पडताच त्यांच्या स्वाभाविक काव्यस्फूर्तीला अचानक भरती येऊन त्यांच्या काव्यमय मनोवृत्तीचे तुषार आपोआप उमाळ्यासरसे उसळून प्रेमळ ऋचांच्या रूपाने बाहेर कसकसे पडत, हे प्रत्यक्ष पाहण जरी आपल्या शक्यतेच्या क्षेत्रात नाही, तरी ऋग्वेदाच्या पारायणांवरून त्या प्रासादिक उमाळ्यांशी आपणाला क्षणभर तरी तादात्म्याचा परमानंद अनुभवता येणे शक्य आहे. निसर्गाच्या असल्याच उज्वल प्रदर्शनावर त्यांची एवढी भक्ति जडलेली होती, की याच प्रदर्शनाची, याच देखाव्यांची आणि याच निसर्गदेवतांची प्रार्थना करण्यात त्यांना स्वानंदसाम्राज्याचे सर्वस्व प्राप्त होत असे.
ऋग्वेदकाळानंतर हिंदुलोकांनी जरी तेहतीस कोटी देवदेवतांची खेकटी आपल्या कल्पनापूर्ण मेंदूतून निर्माण करून हिंदुधर्मियांच्या बोकांडी बसविली, तरी हिंदुधर्मनदाचा उगम सिंधुनदाच्या उगमाप्रमाणेच शुद्ध, सोप्या आणि ओजस्वी अशा एका निसर्गपूजनातूनच निर्माण झालेला आहे, ही गोष्ट वाचकांनी मुद्दाम यानात ठेवावी. ऋग्वेदकाळचे हिंदी आर्य निसर्गाचे पूजक होते. निसर्ग हाच त्यांचा देव.त्याच देवाची त्यानी मनोभावे प्रार्थना केली. सर्व सृष्टी हाच त्यांचा पारमेश्वरी अनादि धर्मग्रंथ आणि सृष्टीचे कौतुकपूर्ण अवलोकन व सृष्टिलीलेच्या निरनिराळ्या नाचरंगांचे प्रासादिक उमाळ्याने काव्यपूर्ण वाणीत वर्णन करणे हीच त्यांची पारायणे. त्यांना ``यापरता धर्म ठावुका नान्य’’ अशी वास्तवीक स्थिती होती. अनेक देवदेवतांच्या, भुताखेतांच्या, भटाभिक्षुकांच्या, धाकट्या मोठ्या बाबांच्या किंवा शनी मंगळाच्या पुजांनी लिडबिडलेल्या सांप्रतच्या हिंदुधर्माचा उगम इतक्या शुद्धतम स्वरूपात झालेला आहे. सृष्टि किंवा निसर्ग हाच `एक देव’ आहे, त्याची एकल्याचीच प्रार्थना करणे हा आम्हा मानवांचा उचित धर्म आहे, त्याच्याच कृपाप्रसादाने आम्ही हिंदी आर्य वीरांना सारी दुनिया पादाक्रांत करून तिचे स्वामित्व पटकावयाचे आहे, ही एकच भावना त्यांच्या मनात वागत होती. मानवी चित्ताला आश्चर्यचकित करून सोडणारे निसर्गाचे अद्भुत देखावे हेच प्रथम त्यांचा या चित्ताची प्रवृत्ती त्या अगम्य विश्वविधात्याची जाणीव ओळखण्याकडे खेचतात सृष्टावलोकनात व निसर्गरहस्याच्या गायनातच चित्तवृत्ती रंगली म्हणजे आपोआप त्या निसर्गकर्त्याच्या कर्तबगारीची ओळख मानवी मनोवृत्तीला हळूहळू पटू लागते. या नियमाप्रमाणे हिंदी आर्यांचा वाङ्मयेतिहास जरी पाहिला तरी त्यातसुद्धा ते याच पायरीनपायरीने ईश्वराच्या एकमेकाद्वितीयमच्या सिद्धांतापर्यंत बिनचूक कसे आले, हे नीट कळून येईल.
पंजाबात उतरलेल्या हिंदी आर्यांची मुख्य चळवळ म्हटली म्हणजे एका मागून एक प्रदेश जिंकून आपल्या कायमच्या वसाहतीकरता काबीज करून घेण्याची होती. हे काम दिसते तितके सोपे नव्हते. येथील मूळचे रहिवाशी – ज्यांना `काळे’ अबॉरिजिनीज असे नाव अलिकडच्या इतिहासकारांनी दिलेले आहे व ज्यांना ऋग्वेदात आर्यांनी `दस्यू’ अशी संज्ञा दिलेली आहे ते काही लेचेपेच नव्हते. त्यांची आर्यांइतकी शस्त्रास्त्रांची सुधारणा झालेली नव्हती, तथापि युद्धाच्या बाबतीत त्यांनी आर्यांशी मोठे छातीठोक सामने दिले, यात काही संशय नाही. शारीरिक आणि बौद्धिक बाबतीत वरचढ असलेल्या गो-या आर्यांच्या पुढे हे काळे दस्यू जरी क्रमशः हतवीर्य होत गेले, तरीसुद्धा जमिनीच्या इंच इंच तुकड्याकरिता त्यांनी आर्यवीरांचे खंडोगणती बळी घेतल्याशिवाय माघार खाल्ली नाही. या दस्यूंना हाकून देऊन त्यांच्या जन्मभूमीचे स्वामित्व पटकाविण्यासाठी आर्यांना एक दोन नव्हे तर सतत सहाशे वर्षे झगडावे लागले.
यावरून इतके निर्विवाद सिद्ध होते की, हिंदी आर्य – यांचे इतर गुण काहीही असले तरी-मोठे कसलेले आणि पट्टीचे लढाऊ लोक होते. बरे, इतकेही असून त्यांची ऋग्वेदातली तात्विक काव्यपूर्ण ऋचारचनाशक्ती गिरीगुहरातल्या एकांत खबदाडात बसून सतत चिंतनमग्न राहणा-या एखाद्या तत्त्ववेत्त्यालाही कुंठित करण्यासारखी होती. वेदपठण-वेदरचना नव्हे! नुसते वेदपठम हे ब्राह्मणांचे आद्यकर्तव्य असल्यामुळे राजाने त्यांना काहीही तर काम सांगू नये; उलट त्यांच्या वेदपठणास व्यत्यय येऊ नये म्हणून राजाने व सर्व प्रजाननांनी या पोपटांच्या पोटापाण्याची यथास्थित व्यवस्था लावून ठेवण्याचा आग्रह धरणा-या मनु, याज्ञवल्यासारख्या अर्वाचीन स्मतिकारांच्या लक्षात हा मुद्दा कसा आला नाही कोण जाणे की पोपटभट नुसते पाठांतर करण्यात त्याच वेदांची ज्या आर्यांनी प्रत्यक्ष रचना, पाठीमागे संसाराचा व्याप व तोंडापुढे लढाईचा अखंड ताप असताना केली, ज्यांना ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या तोंडातून किंवा त्याच्या कमलासनाच्या पाकळ्यातून आपोआप गळतात की स्वयंभू निर्माण होतात, असल्या अचकट विचकट कादंब-यांची कल्पनाही नव्हती आणि युद्ध करतो तेव्हा क्षत्रियत्वाचे लेबल टाळक्यावर लावून करतो व ऋचा करतो तेव्हा ब्राह्मण्याचा पट्टा कपाळावर फरफटवतो याची दखल नव्हती, त्या वेदप्रणीत्या हिंदी आर्यापेक्षा हे पोपटपंची पाठांतरे भट कितीतरी बुद्धीहीन. त्यांच्या पोटापाण्याबद्दल आपण राजाला आणि प्रजेला एवढे बजावून सांगण्यात काय शतकृत्य करती आहोत? पण हे स्मृतिकारच मुळी पडले ब्राह्मणी स्तोमाच्या अंमदानीतले, त्यांना एवढा सारासार विचार किंवा न्यायाची समता कोठून असणार?
ऋग्वेदकालात वर्णभेद किंवा जातिभेद होता काय? असल्यास त्याची कारणे काय? या प्रश्नांचा थोडा खुलासा केला पाहिजे. हिंदी आर्यांनी एतद्देशीय काळ्या दस्यूंना हद्दपार करून हिंदुस्थानचा उत्तर प्रदेश सतत ६०० वर्षे युद्ध करून काबीज केला आण पुढे थोड्याच शतकांनी आपल्या आर्यसंस्कृतीचा प्रकाश सा-या हिंदी द्वीपकल्पावर पाडला. ज्यांनी ऋग्वेदासारखा अत्यंत संस्कृतीपूर्ण ग्रंथ निर्माण केला, त्यांच्या बौद्धिक परिणतेची आपण कल्पनाच केलेली बरी. आर्यांची सुधारणी ही सा-या जगातील प्राचीन अर्वाचीन सुधारणांचा पाया होय. अर्थात् समाज सुसंघटित व सुव्यवस्थित चालण्याकरिता चार प्रकारचे व्यवसाय प्राविण्याने करणारे लोक समाजात अवश्य पाहिजेत, या गोष्टीची त्यांना जाणीव झाली असली पाहिजे खास. त्यांना नवीन नवीन प्रदेश जिंकावयाचे होते. तेव्हा युद्धकलेचे प्राविण्य त्यांच्यात निसर्गतःच होते. परंतु नुसती युद्धकलेची प्रविणता बौद्धिक शक्तीवाचून व्यर्थ, म्हणून त्यांना बौद्धिक सामर्थ्यही तितक्याच प्रमाणात परिणत करावे लागले. बरे, नुसती युद्धकला आणि बुद्धिमत्ता या दोनच भांडवलावर समाजाचा संसार चालणे शक्य नव्हते. शेतीवाडी करून गुराढोरांच्या सहाय्याने जमिनीतून पीक काढणा-या आणि व्यापार करून सांपत्तिक श्रेष्ठता वाढविणा-या व्यापारी कुशलतेचीही त्यांना जाणीव होती. आणि सरतेशेवटी युद्धशक्ति, बौद्धिकशक्ति आणि व्यापारशक्ति यांत गुंतलेल्या लोकांना शारीरिक बलाने मदत करणा-या लोकांचीही समाजाच्या हितासाठी आवश्यकता होतीच. अर्थात् त्यांच्या समाजात युद्धकलाभिज्ञ (militarist), ज्ञानी (intellectuals), व्यापारी (merchants) आणि मजूर (labourers) असे चारी प्रकारचे व्यवसाय `एकमसायवच्छेदे’ करणारे लोक होतो. परंतु हे चार प्रकारचे व्यवसाय चार निरनिराळ्या जातीचे लोक करीत होते असे मात्र मुळीच नाही. ऋग्वेदकाळी जाती मुळीच नव्हत्या. हिंदी आर्यांच्या समाजात कसल्याही प्रकारचा भेद किंवा भिन्नता मुळीच नव्हती. मात्र समाजाच्या संसाराला अत्यावश्यक असे जे वर सांगितलेले चार प्रकारचे व्यवसाय त्यात ज्यांची ज्यांची प्रगती होत असे ते ते लोक एकेक दोनदोन तीनतीन प्रकारचे व्यवसाय सामुदायिक ऋग्वेदहिताच्या दृष्टीने बजाविण्यास वाटेल तेव्हा पुढे होत असत. युद्धाचे शिंग फुंकलेले ऐकू येताच जो हिंदी आर्य आपला भाला बर्ची किंवा तरवार, तीरकामटा हाती घेऊन समरभूमीवर मोठ्या आवेशाने धावून जात असे, तोच हिंदी आर्य लढाईचा मामला आटोपताच आपल्या घरच्या मुलाबाळांची, गुराढोरांची, शेतीवाडीची स्वतःच व्यवस्था पहात असे. संपत्ती वृद्धिंगत करण्यासाठी व्यापाराचा ताजवाही हाती घेत असे.
आणि या सांसारिक दलामलीपासून किंचित् शांतता मिळताच निसर्गदेवतेच्या अद्भुतरम्य देखाव्याने तल्लीन होऊन तिच्या स्तुतिपर ऋचांची रचना करण्यातही स्वतःच रममाण होत असे. ऋग्वेदकाळी देवांच्या मूर्ति नव्हत्या तेव्हा देवळे तरी कोठून असणार? मूर्ती नव्हत्या, देवळे नव्हती आणि भटही नव्हते. प्रत्येक हिंदी आर्य कुटुंबातला यजमान हा आपल्या कौटुंबिक स्वराज्याचा नेता होता. तो नित्य नियमाने आपल्या घरी होमाग्नि प्रज्वलित करीत असे. सोमरसाची त्यात आहुती देऊन आपल्या कुटुंबाची, आरोग्याची, शेतीवाडीची, गुराढोरांची संपत्तीची भरभराट व्हावी, या हेतूने तो निसर्गदेवतेची प्रार्थना करीत असे. त्या वेळी एकादशन्या सांगणारे किंवा पिंड देऊन स्वर्गाला बिनचूक रवानगी करण्याचा व्यापार करणारे पोपटपंटी भट अस्तित्वात नव्हते. भट आणि भट्ट हो दोन्हीही व्यवसाय एकच हिंदी आर्य स्वतः करीत असे. हिंद आर्य योद्धे हेच त्या काळी आर्यवसाहतवाल्यांचे पुढारी होते आणि युद्धाप्रमाणेच धार्मिक बाबतीतसुद्धा समाजाचे ग्रणी तेच होते. क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य किंवा शूद्र ही नावे सुद्धा त्या काळी सांप्रतच्या अर्थाने रूढ नव्हती किंवा अशा प्रकारचे चार भेद अथवा संघ आपल्या समाजात निर्माण करावे ही कुकल्पनाही ऋग्वेदकालीन आर्यांना शिवली नाही.
स्वयंसेवक मासिक, फोंडा गोवा, डिसेंबर १९२१
लेख १०
आई
जग हे जितके चमत्कारिक आहे, तितकेच ते चमत्कारपूर्ण आहे. विधात्याने निर्माण केलेले विश्व हाच मुळी कल्पनातीत असा एक चमत्कार आहे आणि विश्वविधात्याच्या करणीवर ताण करून दाखविण्यासाठी मनुष्यांनी `अहं ब्रह्मास्मि’ या प्रत्यक्ष जाणिवेने नाना आश्चर्याणि वसुंधरा बनविण्याची शिकस्त चालविली आहे. कल्पनेच्या समुद्र मंथनातून निर्माण केलेली अनंत चमत्कारिक रत्ने माणसांनी वसुंधरेच्या या अजब अजायबखान्यात व्यवस्थित मांडून ठेविली आहेत. ती पाहिली की आपले हृदय कौतुकाने भरून येते. मनोवृत्ती विस्मयाने चकित होते आणि स्तुतीचा निदान एक तरी गोड उद्गार निघावा म्हणून जिव्हा योग्य शब्दयोजनेसाठी वळवळते, पण `वाहवा’ एवढ्या उद्गारावरच वाक्शक्तीची मजल खुंटल्यामुळे अखेर हळहळते. आग्र्याचा ताजमहाल, मिसर देशातले पिरामिड, स्वच्छंद वातावरणाला हुकमी संदेशवाहक बनविण्यासाठी मार्कोनिग्राम किंवा बिनतारी टेलिफोन, दूरस्थ किंवा कालवश झालेल्या माणसांची भाषणे व आल्हाददायक गाणी वाटेल तेव्हा वाटेल तेथे प्रगट करणारा फोनोग्राफ, इत्यादि अनेक मनुष्यनिर्मित चमत्कारांची शाब्दिक संभावना करिताना, हृदयात उचंबळणा-या कुतूहल-लहरींचा थैथयाट व्यक्त करताना, माणसाची वाक्शक्ति `वाहवा’ या एकाच शब्दोच्चाराच्या उंबरठ्यावर कुंठीत होते. निसर्गनिर्मित चमत्कारांविषीही हाच प्रकार. उदाहरणार्थ, आपण उषःकालचा चमत्कार कवीच्या काव्यमय चष्म्यातून पाहण्याचा यत्न करू. एका विशेष चैतन्याचा अवर्णनीय सुगंधाने ज्याचे अणुरेणू परिमळयुक्त झाले आहेत, असा प्रभातीचा प्रबोधक वातावरणाचा जलधी मंदमंद वायूच्या रहाळ्या मारीत आहे. सृष्टिदेवता त्यात जलविहार करीत आहे. इतक्यात `भगवान सविता आले की काय?’ हे पाहण्यासाठी तिने आपला हसरा टवटवीत चेहरा जलपृष्ठावर काढताच दंवकण तिच्या मस्तकावर मौक्तिकांचा सडा पाडीत आहेत. जलविहारामुळे भिजून चिंब झालेला सृष्टीचा केशकलाप पिळून स्वच्छ पुसण्यासाठी किरमिजी अरुणाचे रेशमी फर्द उषादासीने झटकन् पुढे करून, दाही दिशा उजळणा-या तेजाचा सुंगधी विश्वंभर धूप सर्वत्र प्रसृत केला आहे. धूपाच्या घमघमाटात मग्न असताच, भगवान सूर्यनारायण आपला एकच हात पुढे करून सृष्टीच्या निटिलावर सुवर्ण कुंकुमाचा रेखीव टिळा रेखीत आहे. बोलबोलता सा-या विश्वाची नजर चुकवून देवीने भरजरी सहस्ररश्मी पैठणी परिधान केली आहे. अंगावर दिसतो न दिसतो असा विरळ धुक्याचा शालू पांघरला आहे. अवघ्या तीन पावलांत सा-या त्रिभुवनाचा आक्रम करीन, या विजयाकांक्षेने फुरफुरलेले आपले लालबुंद मुखबिंब भगवानजीने क्षितिजपटलावर वर काढताच, उत्फुल्ल सुमनदलांच्या द्वारे सृष्टी दिव्य स्मितहास्य करीत आहे. अंगावर पांघरलेला धुक्याचा शालू अलगज उडवून आलिंगनासाठी सवित्याने पसरलेले विश्वस्पर्शी विशाळ बाहू पाहून, चंडोलादि गायकगण `आस्ते कदम’च्या ललका-या तारस्वरात भिरकावीत आहेत आणि या अतिप्रसंगाचा बोभाटा सा-या विश्वात दुमदुमल्यामुळे सृष्टिदेवता विनयाच्या सात्विक मुरडणीने लाजली आहे. हा सर्व हृदयस्पर्शी चमत्कारिक देखावा पाहून मानवांच्या वाक्शक्तीने मुग्धतेच्या आड लपून आपल्या अंतस्थ कुतूहलाचे व्यक्तीकरण पाणी भरल्या डोळ्यांनी करण्यापलीकडे अधिक काय करावे बरे?
मुळी विश्वविधाताच जर गूढ व अकल्पनीय, तर त्याची विश्वरंगभूमीवर उधळलेली नाना आश्चर्याणि वसुंधरा तितकीच गूढ व अवर्णनीय का असू नये? पण या वसुंधरेच्या चमत्कार-खाणीचाही गर्व परिहार करणारा क अद्वितीय चमत्कार आहे. चमत्कार वाटतो हाच की या चमत्काराचा चमत्कार आम्हाला भासू नये, हे किती चमत्कारिक? खरोखर मानवी दुनिया बुद्धिमत्तेच्या चौकसपणाचा कितीही डौल मिरवो, ती फारच चमत्कारिक खरी. साता समुद्रापलीकडचे दिसते, पण हाताजवळचे भासतसुद्धा नाही. याचे कारण हेच की अतिपरिचयामुळे या विश्वोत्तर चमत्कारांची अवज्ञा होमे हा मानवी सृष्टीच्या स्वभावधर्म-स्मृतीत गुन्हा मानलेला नाही. आग्र्याच्या लोकांना ताजमहालाच्या लोकोत्तरपणापेक्षा मुशाफरांकडून मिळणा-या कवडी दमडी भिकेचे महत्त्व फार वाटते. पंढरपूरच्या बडव्यांना किंवा काशीच्या पंड्यांना विठोबाचे किंवा विरूपाक्षाचे महत्त्व लवमात्र वाटत नाही. त्यांची सारी महत्त्वाकाक्षा यात्रेकरूंच्या गाठोड्याभोवती आशाळभूत पिशाच्चाप्रमाणे वावरत असते.
गंगानदीच्या पावित्र्याच्या महिम्याने हृदयात भाविक भावनेचे मळे पिकलेले लोक गावोगावहून धाव घेत काशीला जातात, पण तेच काशीचे लोक त्याचगंगेचा उपयोग नियमीत प्रातर्विधीसाठी करतात. ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन होवो वा न होवो, पण भारत काळापासून इतिहासप्रसिद्ध असलेला स्यमंतक-कोहिनूर मणि काळाने डोळे मिटटण्यापूर्वी निदान एकवार डोळे भरून पाहावा, म्हणून आम्हा भारतवासियांची तृष्णा केवढी दांडगी! पण आमच्या पंचम जॉर्ज बादशहांना हातातल्या वॉकिंग स्टिकइतकेच त्याचे महत्त्व वाटत असावे; याचे कारण अतिपरिचय. या प्रचंड विश्वविस्ताराला प्रकाशित करणा-या तेजोनिधी भास्कराला सुद्धा `घटकाभर हो बाजूला’ असे सांगणारे अशोक, प्रतापसिंह, ज्ञानेश्वर, तुकाराम, शिवाजी काय थोडेथोडके पुरुषोत्तम सूर्य आपल्यात चमकून गेले? पण आपलेपणाच्या अतिपरिचयामुळे त्यांच्या महत्त्वाचे लोकोत्तर चमत्कार त्या वेळी आपल्या विचारांना शिवलेही नाहीत.
आई हा एक असा चमत्कार आहे की त्याच्या निकट परिचयामुळे त्यांतील गूढ प्रेमाच्या रहस्याचे महत्त्व आम्हाला वास्तविक समजले तरी उमजत नाही, उमगले तरी सापडत नाही व भासले तरी व्यक्त करता येत नाही. आई हे दोन स्वर, ही दोन अक्षरे, हा एक सुटसुटीत सोपा दिसतो खरा, पण या दोन अक्षरांच्या इवल्याशा जागेत सारे विश्व सामावलेले आहे. या शब्दात एक विलक्षण जादू आहे. विश्वाच्या आदि अंताची माया या दोन अक्षरी शब्दांतच संकलित झाली आहे. आम्ही माणसे जसजशी शहाणी होत आहोत तसतशी आमची व एका विशिष्ट गोष्टीची फारकत होत चालली आहे. ती गोष्ट म्हणजे, एकवाक्यता. चार शहाणी डोकी एका ठिकाणी जमली आणि त्यांचे एका गोष्टीविषयी चटकन एकजनिशी एकमत झाले; हा बाबसुद्धा आता अघटित चमत्कारात मोडू पाहात आहे. परंतु आई ही अशी चमत्कारिक बाब आहे, की तिच्याविषयी राष्ट्रभेद, देशभेद, संस्कृतीभेद, व्यक्तिभेद, वर्णभेद इत्यादि सर्व भेदांचा समूळ छेद होऊन, आई या एकाच शब्दोच्चाराने सर्व मानवी दुनिया – नव्हे अवघे भूतजात – झटदिशी प्रेमाच्या एकतान स्थितीत एकमताने विलीन होते. आईचे प्रेम जात्याच मुळी अत्यंत मुग्ध असते. ते सर्वांना भासत असले, तरी दिसत नाही. परमेश्वराने स्त्रीजातीला बहाल केलेल्या अलौकिक स्निग्धतेच्या सत्वगुणाचा अर्क आईच्या प्रेमात आत्म्याप्रमाणे रसरसत असतो. आईचे प्रेम आईलाच ठावे, इतरांना – विशेषतः पुरुषांना त्या प्रेमाची खरी कल्पना येणे शक्य नाही.त्यादिव्य प्रेमाचे किंचित् उतराई होण्यासाठी बुद्धिमान पुरुषांनी आपल्या निवडक वाक्पुष्पांची आईसाठी जरी शय्या तयार केली, किंवा मानवी विकारांचे तर सर्व तिखट रस घटकाभर दूर झुगारून देऊन सात्विकपणाच्या मृदुल एकतानतेने आपल्या लेखणीला आईच्या प्रेमाचे शब्दचित्र काढण्यासाठी कितीही नाचविले, तरी बुद्धिमत्तेची रसाळ ओजस्वी शाई प्यालेले ते कलम, आई एवढा एकच शब्द लिहून त्याच्यापुढे नकळत पडलेल्या पूर्णविरामात आपल्या कुंठित मतीचा पूर्ण विराम स्पष्ट व्यक्त करते. ईश्वरी प्रासादाची सनद पटकावून, कृष्ण भगवंताच्या मुरलीप्रमाणे, सा-य जगाताल मोहिनी घालणारे महाकवि कितीक होऊन गेले. त्यांनी चंद्रसूर्याला कल्पनेच्या भरारीत हाताबोटांवर नाचविले. मेरुपर्वताचा घुसळखांब करून शेषाच्या दोरीने अखिल महासागरांचे मंथन केले. आकाशातील तारकांना अलगज उचलून, काव्यातील नायिकेच्या डोळ्यात बसविले. या महकवींनी कोठे पर्वतांना व्याख्याने द्यावयास लाविली, नद्यांना गाणी गावयास भाग पाडले, गगन-संचारी मेघांना प्रणयपत्रिकांच्या चिटो-यांची नेआण करणारे दूत बनविले, तर कोठे स्वयंसंचारी वातावरणाला आकाशवाणीचे जलशे नाचविणारे तमासगीर बनविले. परंतु आजपर्यंत आईला काव्याचा विष केला असता, `आई थोर तुढे उपकार’ या उद्गारापलीकडे आपल्या निष्णात कल्पनेची भरारी मारण्याचे एकाही महाकवीला साधले नाही. याचे कारण हेच की, आई व आईचे प्रेम या दोन गोष्टी अत्यंत गूढ व मुग्ध असल्यामुळे नुसत्या विचक्षण मानवी कल्पनेला त्यांचे सांगोपांग आकलन होणे शक्य नसते. अशा वास्तविक स्थितीत प्रस्तुत लेखकाच्या दुबळ्या लेखणीनेही `आई थोर तुझे उपकार’ या सूत्राने आईला, आपल्या भारत जननीला आणि त्या दयानिधि जगन्माउलीला, कृतज्ञतेने तुडुंब भरलेल्या हृदयाला कसेबसे सावरून, साष्टांग प्रणिपात घालण्यापलीकडे अधिक काय करणे शक्य आहे?
जननीजन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि ।।
।। वन्दे मातरम् ।।
[प्रबोधन, १-९-२२]
लेख ११
उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधतं
उठा, जागे व्हा आणि भगवंताने दिलेले वर नीट समजून घ्या. औपनिषदिक सुवर्णयुगकाळी ज्या दिव्य मंत्राने भारतखण्डाला जगाचा जगद्गुरु बनविले, तोच मथळ्यावरील दिव्य औपनिषदिक मंत्र आज आमच्या सामाजिक, धार्मिक व राजकीय जीवनात चैतन्य ओतण्यासाठी पुनश्च आसेतुहिमाचल वातावरणात संचार करू लागला आहे. नव स्वातंत्र्ययुग आता लवकरच उगवणार म्हणून जिकडे तिकडे पुनर्घटनेची एकच गडबड उडून राहिली आहे. संघशक्तीची जाणीव सर्वत्र बेसुमार थरारू लागली आहे. भगवंताने आपल्याला कोणकोणते वर दिलेले आहेत, आपले जन्मसिद्ध अधिकार व हक्क कायकाय आहेत आणि ते हक्क आपण का व कसे गमावून बसलो, याची कोंडी सोडविण्यात प्रत्येकजण चूर होऊन गेला आहे. एकीकडे उन्नत देशबांधव परकीय दास्याचे पाश तोडून टाकण्याची शिकस्त करीत आहेत, तर दुसरीकडे याच उन्नत देशबांधवांनी उन्मत्तपणाने चिरकालीन दास्यात डांबून टाकलेले अवनत देशबांधव त्यांच्या सामाजिक व धार्मिक दिलेले आहेत. याचे मोठ्या धिटाईने संशोधन करू लागले आहेत. आज घटकेस देशात जी चळवळ सुरू आहे तिचे किंचित् बारकाईने पृथकरण केले तर असे आढळून येते की सर्वत्र जरी राष्ट्रकार्य राष्ट्रकार्य असा एकच ध्वनि निघत आहे, तरी महाराष्ट्रातील प्रत्येक समाज आपापल्या विवक्षित जातिसंघाच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी मोठ्या खबरदारीने, शिस्तीने व नेटाने अहोरात्र प्रयत्न करीत आहे; आणि ख-या राष्ट्रहिताच्या दृष्टीने हे प्रयत्न खरोखर प्रशंसनीय होत. कारण, `प्रत्येकजण जर आत्मसुधारणा करण्याची शिकस्त करील, तर राष्ट्रसुधारणा चुटकीसरशी होईल,’ हे स्माईल्सचे तंत्र यांत प्रधान आहे. मात्र अशा प्रकारचे प्रयत्न करीत असताना स्वतःच्या घरच्या मुलींच्या मंगळागौरी व मुलांच्या मुंजी या `राष्ट्रीय’ मंगळागौरी व `राष्ट्रीय’ मुंजी असे भासविण्याचा जो मोह कित्येक पुढारलेल्या समाजात अनावर झालेला आहे, तो मात्र चिळस आणणारा आहे. जात ही धार्मिक किंवा धर्ममान्य संस्थआ नव्हे. राष्ट्राच सामाजिक जीवन सुसंघटित चालावे म्हणून एका काळी यदृच्छेने निर्माण झालेली ती सामाजिक संघसंस्था आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यादि हक्कांचे सनदपट्टे जन्मसिद्ध नसून गुणकर्मसिद्ध असल्यामुळे, जन्मतः किंवा जातितः ब्राह्मण्याची व क्षत्रियत्वाची कोरडी प्रौढी मिरविणे म्हणजे भगवंताचा उघड उघड द्रोह होय. हा भगवद्रोह करणा-यांना भगवंताचे वर कधीही प्राप्त होणार नाहीत. आपण जातितः कोठच्याही संघाचे घटकावयव असलो तरी व्यक्तिशः गुणकर्मप्रवृत्तीने कोण आहोत, हे सिद्ध करून दाखविण्याचा व त्याप्रमाणे प्रत्यक्ष वर्तन करण्याचा `सेल्फ डिटरमिनेसन’चा – आत्मनिर्णयाचा हक्क, भगवंताचा वर, प्रत्येक व्यक्तिमात्रास आहे. हा नवयुगाचा मंत्र धिक्कारणा-यांची मात्र यापुढे धडगत दिसत नाही. व्यक्तिशः आत्मोन्नति साधण्यला जसा कोठेच अटकाव नाही, तसा जातिशः समाजोन्नति करणे स्वराज्यद्रोह अथवा राष्ट्रद्रोह करणे असे बाष्कळ विधान करण्यातही मोठा शहाणपणा नाही. या दृष्टीने महाराष्ट्रातल्या असंख्य जातिसंघांनी स्वतंत्रपणे उन्नतीचा मार्ग चोखाळण्यास कंबरा बांधल्यास, ते एक अभिनंदनीय राष्ट्रकार्यच होय. तंबो-याच्या चार तारा निरनिराळ्या वाजविल्या तर पंचम षड्ज जोड व खर्ज असे निरनिराळे ध्वनि देतात ख-या, परंतु त्यांचा एकसमयावच्छेदे झणत्कार केल्यास सा-या विश्वाला मोहनी घालणारे मधुर संगीत त्यांतून निर्माण होते. जातिसंघांच्या वरपांगी व एकांगी भिन्नत्वामुळे गांगरून जाऊन या संघांचाच तिरस्कार करणा-यांनी वरील तंबो-याची उपमा नीट विचारात घ्यावी. मात्र असे होणे शक्य आहे, नव्हे, ब-याच जातिसंघांच्या बाबतीत ते खरेही आहे, की कित्येक तारा मोठ्या नाठाळ आढळतात, कित्येक बदसूर असतात, कित्येक गंजलेल्या असतात आणि कित्येक अहंमन्यतेच्या पिळांनी पिळवटल्यामुळे अगदी तुटावयासही झालेल्या असतात. अशा प्रसंगी संघहितेच्छु राष्ट्रधुरीणांचे कर्तव्य जितके स्पष्ट आहे, तितकेच ते उघड आहे. आपल्या विशिष्ट सघाच्या हृदयाची तार जर बदसूर बनली असेल तर तिच्या कानाच्या खुंट्या मोठ्या कुशलतेने पिरगाळून तिला एकतानता येण्याइतका नाजूक तणावा दिला पाहिजे. ती जर जीर्णमताच्या वाळवीमुळे गंजलेली असेल तर स्नेहपूर्ण विचारांचा तिजवर हात फिरवून नवमताच्या पॉलिश पेपरने तो गंज घासून टाकला पाहिजे. ती जर अहंमन्यतेच्या ताठ्याने ताठर बनली असेल, तिला गुंडाळी पडली असतील, तर मोठ्या कुशलतेने ती गुंतागुंत एक तर सोडविली पाहिजे, नाहीतर ती जुनाट कुजकी तार अजिबात तोडून तिच्याऐवजी नवीन वसविली पाहिजे, म्हणजे छातीठोकपणाने आपल्या जातिसंघाची नव्या धोरणावर पुनर्घटना केली पाहिजे.
चैतन्य, मग ते सामाजिक असो वा धार्मिक असो किंवा राजकीय असो, तेथे भक्तजनांना साह्य करायला `गरुडावरि बैसोन माझा कैवारी’ येतोच येतो. देव भावाचा भउकेला असेल; परंतु चैतन्यावर – लोकजागृतीवर – चळवळीवर त्याचा कृपाकटाक्ष, भावाच्या जोरावर देव मिळविणा-या भक्तांच्या हाकेला ओ देण्याच्या पूर्वीच पडतो. म्हणूनच समर्थ म्हणतात की `सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील त्याचे । परि आधी भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे।।’ सध्याचा काळ असा आहे की या चालू हंगमात जो निजून राहील, तो कायमचाच निजून राहील. त्याच्या अवनतीला मृत्यू नाही व पुनर्जन्मही नाही. या राष्ट्रोद्धाराच्या उषःकाली जे जे समाज अस्तन्या मागे सरसावून आत्मोद्धाराच्या आखाड्यात उतरतील तेवढे सारे क्षत्रिय वीर म्हणून भावी नवयुगात जंगद्वद्य होतीस. जे मानापमानाचे गाठोडे उराशी बाळगून अहंमन्यतेच्या कोप-यात घुंगट मारून पडतील, ते सारे शूद्र ठरतील. प्रचलित काळाचा झपाटाच इतका जबरदस्त आहे की त्या झपाट्याच्या सोसाट्याबरोबर चालण्याची जे जे समाज हिंमत धरतील, त्यांचाच तेवढा टिकाव लागणार आहे, बाकीच्यांचे कालचक्राच्या घरटात वस्त्रगाळ पीठ पडल्याशिवाय मुळीच राहणार नाही. या दृष्टीने आमच्य सर्व महाराष्ट्रीय बांधवांच्या आत्मोन्नतीच्या आणि आत्मोद्धाराच्या ज्या चळवळी यदृच्छेने चालू झालेल्या आहेत, त्याबद्दल प्रत्येक व्यापक विचारी त्यांचे सकौतुक अभिनंदनच करील.
श्रीमद्रामकृष्ण परमहंस यांच्या सुलभवेदान्तनामक ग्रंथांत एक मनोवेधक चुटका दिलेला आहे. आकाशात अंतराळी होमा नावाचे काही पक्षी राहतात. ते कधीही पृथ्वीतलावर येत नाहीत. त्यांचा सर्व प्रकारचा आयुष्क्रम व संसार वरच्यावर अंतराळीच चाललेला असतो. ते आपली अंडीसुद्धा वर हवेतच घालतात. अर्थात अंडी घातल्याबरोबर ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे भराभर खाली कोसळू लागतात. या कोसळण्याच्या सोसाट्यातच ती खडाखड फुटून त्यातून निघालेली होमा पक्ष्यांची पिल्लेसुद्धा गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे खेचली जातात. परंतु इतक्यात त्या पिल्लांचे आत्मज्ञान जागृत होऊन, `अरे! आम्ही होमा पक्ष्यांची पिल्ले; इकडे खाली पृथ्वीकडे का अवनत होत चाललो?’ या नुसत्या विचाराच्या जोरावरच ती चटकन् आपले पंख उभारून पुनश्च उंच अंतराळात उड्डाण करून जातात. या छोट्या चुटक्यात अध्यात्मदृष्ट्या काही रहस्य असले, तरी यात अवनत व्यक्ति, समाज वा राष्ट्र यांच्या पुनर्घटनेची खरी गुरुकिल्ली आहे, यात संशय नाही. अवनतीच्या कल्पनेने निराशामय झालेल्या व्यक्तीने वा समाजाने होमा पक्ष्यांच्या पिल्लांचा हा आत्मज्ञान-प्रबोधनाचा मंत्र अक्षयी चिंतनात ठेविल्यास त्यांचे उन्नतीत इतक्या चमत्कारिक रीतीने पर्यवसान होईल की त्यांचे त्यांनाच आश्चर्य वाटू लागेल! नुसत्या अवनतीच्या कल्पनेने जेवढी अवनती होते, तेवढी आजूबाजूच्या परिस्थितीनेही होत नाही, असा मानसशास्त्रवेत्त्यांचा ठाम अभिप्राय आहे. म्हणूनच ``कल्पनेची बाधा न होणे काळी। ही संत मंडळी सुखी असो.’’ हे भरतवाक्य आमच्या भजनी मंडळीच्या तोंडी चिरंजीव होऊन बसले आहे. कल्पनाशक्ती ही जितकी विधायक आहे तितकीच ती विघातकही आहे. विधायक असताना ती देवतेप्रमाणे उन्नतीचे पडदे भराभर मोकळे करून आपल्या भक्ताला नंदनवनाच्या ऐश्वर्याचे सौख्य देते आणि तीच एकदा विघातक बनली म्हणजे वाळवीप्रमाणे भक्ताच्या मनोवृत्तीला आतून पोखरून वाटेल त्या परिस्थितीच्या कुविचारांच्या धक्क्यांनी त्याला पुरा खिळखिळा करून सोडते. अशा या विघातक स्थितीत व्यक्तीने, समाजाने किंवा राष्ट्राने होमा पक्ष्यांच्या पिल्लांप्रमाणे परतीची जर उचल केली नाही, तर मात्र त्या व्यक्तीचे, समाजाचे किंवा राष्ट्राचे मरण फार दूर नाही.
[प्रबोधन १६-१०-२१]
लेख १२
मुके गुरू
दयाळू व न्यायी म्हणून ज्यांची कीर्ती आज सा-या भूगोलावर जरी नसली तरी आसेतुहिमाचल भरखंडात नारोशंकरच्या घंटेप्रमाणे ठणाणत आहे, त्या आमच्या इंग्रज सरकारच्या प्रतिनिधींवर व उपप्रतिनिधींवर आजकाल त्यांच्या स्वैर वर्तनाबद्दल आणि बेसुमार अरेरावी गाजविण्याबद्दल बहुतेक वृत्तपत्रांतून कडक टीका येत आहे. वास्तविक पाहता या टीकांचा तोफखाना लॉर्ड कर्झन साहेब व्हाईसरॉय यांच्या कारकीर्दीच्या शेवटच्या अंकापासून झडू लागला हे आबालवृद्धांस माहीत आहे. परंतु प्रस्तुतचा लेख लॉर्ड कर्झनने आमच्या देशावर जो एक महदुपकार करून ठेविला आहे, त्याचे सविस्तर वर्णन करून लॉर्ड बहादुरास एक मसालेदार थँक्स् देणार आहे, हे वाचून कित्येक हुरळ्या व नकली जहालास मिरच्या झोंबल्याशिवाय खास राहणार नाहीत अशी त्यास खात्री आहे.
वंगभंगासारखे अजरामर व सदैव चालते बोलते स्मारक हिंदुस्थानात स्थापन करून सर्व भारतवासियांचा शेवटचा निरोप घेऊन ज्य वेळेस आमचे लॉर्ड कर्झनसाहेब आपल्या मातृभूमीप्रत गमन करिते झाले, त्यावेळी त्यांनी जुन्या इमारतीची डागडुजी करून त्यांना नीट व्यव्थेत ठेवण्याचा एक हुकूनमाना काढला व तो अमलात आलेला प्रत्यक्ष पाहिला. यापूर्वी जुन्या इमारती, राजवाडे, स्तंभ तट इत्यादी प्राचीन स्मृतिदर्शकांना कायम ठेवावे की त्यांना पल्या अधिकाराच्या कुधळीखो-यांनी पार खणून काढून जमीनदोस्त करावे हा एक चर्चेचा प्रश्न होता. परंतु शुक्लेंदूच्या धवल किरणात आपल्या अंगचे मूर्तिमंत तेज प्रतिबिंबित करून शहाजहान बादशाचे वैभव आजदिनतागायत चिरस्मरणीय ठेवणारा आणि यमुना नदीच्या निर्मल जलोदधीत आपल्या प्रतिबिंबाला पूर्ण बिंबवून मनःपूत जलक्रीडेने प्रेक्षकांना तल्लीन करणारा ताजमहाल वकील मध्यंतरी पडल्यामुळे मशारनिल्हे लॉर्ड साहेबांच्या मनोदेवतेने वरील जीर्णोद्धाराचा हुकूम फर्मावला. हा चमत्कार कसा का घडून येईना, परंतु कर्झन साहेबांनी आम्हा भारतवासियांवर हा एक महदुपकार करून राष्ट्रीय शिक्षणाचा एक मार्ग खुला करून ठेविला खरा.
सांप्रत सुरू असलेली स्वदेशी चळवळ, मग तिला लॉर्ड मिंटोसाहेबाची `प्रामाणिक’ स्वदेशी चळवळ म्हणा, किंवा खरी राष्ट्रीय चळवळ म्हणा, ती अस्तित्वात आल्यापासून राष्ट्राच्या कल्याणार्थ जे जे यत्न राष्ट्रांतील लोकांकडून करण्यात येत आहेत, ते ते सर्व आमच्या राज्यकर्त्यांच्या अधिकारपूर्ण डोळ्यांना उलटे दिसत असून, त्यांचा विपर्यास आपले कंटकमय जाळे सर्व हिंदुस्थान देशभर पसरून त्यात अनेक प्राणी धरीत आहे व कित्येक सापडले जात आहेत. अशा प्रसंगी हिंदी लोकांनी राजनिष्ठा प्रदर्शित करण्याची कितीही विविध मार्ग शोधून काढले तरी ते आमच्यावरील अधिकारी मंडळास अर्थातच विपरीत भासायचे. हा काळाचा महिमा होय. हिंदी लोकांची बडबड बंद करण्यासाठी सरकारला दातखिळीचा कायदा काढणे भाग पडले. हा कायदा सजीव बोलक्यांकरिता झाला, तथापि निर्जीव बोलक्यांकरिता सरकारकडून मात्र उत्तेजन दिले जात आहे, याबद्दल सर्वांनी आमच्या दयाळू माबाप सरकारचे अभिनंदन करणे त्यांचे कर्तव्यकर्म आहे. सभाबंदीचा कायदा फार झाले तर हवेत श्वासोच्छवास करणा-या मानवी प्राण्यांची संमेलने पोलीसच्या दंडुक्यांनी हाणून पार पिटाळून लावील; परंतु प्राचीन इमारतरूपी मुक्या गुरुमालिकांची संमेलने व त्यात होणारी व्याख्याने बंद करण्याच्या कामी तो कायदा काय उपयोगी? एज्युकेशन बिल फार झाले तर सांप्रतचा शिक्षणाचा ओघ आकुंचित करून विद्यार्थ्यांची शिक्षणपद्धती साचेबंद पवित्र करील; परंतु आमच्या पूर्वजांनी बांधऊन ठेवलेले स्तंभ, मनोरे, राजवाडे, मशिदीरूपी मुके गुरू आपल्या सणसणीत व स्पष्ट वक्तृत्वाच्या ओघात देत असलेले ख-या राष्ट्रीयत्वाचे शिक्षण नियमित करण्याच्या कामी ते बिल फोलच ठरणार. तेव्हा अनेक ध्येयांपैकी इतर गोष्टी जरी क्षणभर बाजूला ठेवल्या तरी राष्ट्रीय शिक्षण हे ध्येय साध्य करण्यासाठी वरील गुरूंचा आपल्याला जितका उत्तम उपयोग होईल तितका दुसरा कशाचाही होणार नाही. आम्हाला राष्ट्रीय विश्वविद्यालये स्थापन करण्यासाठी नवीन फंड उभारण्यास नको किंवा `अध्यापकांच्या जागा रिकाम्या आहेत’ अशी जाहिरातही राष्ट्रमतांत प्रसिद्ध करण्याची जरूर नाही. कारण आमच्या पूर्वजांनी आमच्याकरिता खरी व निर्भेळ राष्ट्रीय शिक्षणाची विश्वविद्यालये यापूर्वीच स्थापन करून ठेवली आहेत. या विश्वविद्यालयांचे नियम फार कठीण नसून अगदी सोपे आहेत. यात विद्यार्थ्यांस सर्व प्रकारचे शिक्षण फुकट दिले जाते. ही विद्यालये कोठे कोठे आहेत याचा स्थलावकाशाप्रमाणे विचार करू. परंतु तेथील गुरुमंडळ मात्र मुके असल्यामुळे त्यांपासून शिक्षण मिळवण्याची हातोटी प्रत्येक विद्यार्थ्याने आधी साधून घेतली पाहिजे.
ज्ञानाच्या घुसळखांबाला ज्यांनी इतिहासपठणाची रवी बांधून सद्सद्विवेकबुद्धीच्या हंड्यात आपले हृदय घुसळून घुसळून लोण्यापेक्षाही मृदु बनविले असेल, असा एकादा विद्यार्थी, भरदरबारात निजामाला हजाम म्हणावयास न भिणा-या बाजीराव पेशव्यानी वसविलेल्या पुण्यभूमीत – पुणे – येथे आला असता त्याच्या मनाची तेथे काय स्थिती होते पहा. पुण्यास पाऊल ठेवताच ``ज्या राघू भरारीने पेशवाईच्या पराक्रमाचे झेंडे अटकेस लावले त्याच भटवंशजाची ही राजधानी काय?’’ सर्व महाराष्ट्राचा कलिजा युवराज विश्वास पानपती नष्ट झाल्यावर ``भाऊ विश्वास’ करीत प्राण सोडणा-या नानासाहेबाची मृत्युभूमी पर्वती ती हीच काय? द्वापार युगातल्या कृष्णाच्या रंगपंचमीवर सरशी करणा-या सवाई माधवरावांच्या रंगपंचमीच्या रंगाचा सडा याच पुण्यभूमीवर पसरला होता काय? इ. इ.’’ अनेक विचार-तरंगात गुंगून तो शनवार वाड्याच्या दिल्ली दरवाजासमोर येतो. तो अजस्र तट, ते धिप्पाड व भव्य बुरूज, तो अफाट दिल्लीदरवाजा पहाताच त्याची तंद्री क्षणमात्र उतरून तो शुद्धीवर येतो आणि त्या तटाविषयी विचार करू लागतो. अर्थात त्या विचाराशी त्याचे तादात्म्य झाल्यावर तो शनवार वाड्याभोवतालचा तट त्याला स्फुंदताना दृष्टीस पडला तर त्यात नवल कोणते? सांप्रत शनवार वाडा*३ तर अस्तित्वात नाहीच पण त्याचा शिल्लक राहिलेला तट रसिक विद्यार्थ्याच्या मनात विविध विचारक्रांती करून त्याला काही काळपर्यंत पेशवाईतच नेऊन बसवितो. विचारक्रांतीची पायरीवर पायरी चढता चढता व तादात्म्याची कमान चढत्या प्रमाणावर वाकता वाकता तटाचा प्रेक्षक आपले भान विसरतो. त्याला त्यावेळी निराळीच दृष्टी त्याच्या डोळ्याला दिसू लागते.
पहा पहा हे द्वार `दिल्ली’ सुनामे । जरीच्या निशाणाविना तें रिकामें ।।
असा दिल्लीदरवाजा आपले पूर्व वैभव आठवून रडत असताना दृष्टीस पडतो. बरोबरच आहे.
अहा जेथुनी स्वारि थाटांत जाई । तिथें झोंपती भ्याड सारे शिपाई ।।
ज्या दरवाजातून खर्ड्याच्या समरांगणावर निजामाची खोड मोडून त्याला भगव्या झेंड्याचा प्रताप दाखविण्यासाठी वसईच्या मोह-याचा गुंडा पुत्र भाऊसाहेब रणवाद्यांच्या गंभीर व कर्कश ध्वनीत व नौबदी चौघड्याच्या दुडुम् दुडुम् दणक्यात, जरीपटक्याचा हत्ती पुढे चालवीत, याच दिल्लीदरवाजाचा विजयप्राप्तीचा आशीर्वाद घेत घेत, आपली सर्व महाराष्ट्रीय सेना, आपल्या सेनापतित्वाखाली घेऊन गेला; ज्या याच दिल्लीदरवाजातून `हरहर महादेव’ची गर्जना करणारे मराठे वीर, रथी, महारथी सर्व भरतखंडाच्या विश्वासाला आपल्या तळहातावर नाचवीत झेलीत दिल्लीच्या तक्तावर हिंदुस्थानचा बादशहा म्हणून स्थापन करण्याकरिता `मारू किंवा मरू परंतु भरतभूमीचा हा सौभाग्यतिलक चिरविजयी करू’ अशी कृतांतवत् गर्जना करीत गेले; ज्या याच दिल्लीदरवाजातून महादजी शिंदे सखारामा बापू, हरिपंत फडके, बापू गोखले, निळकंठराव पागे इत्यादि नरशार्दूल आपापल्या चोपदारांच्या व हलका-यांच्या `निगा रख्खो’ ललका-यांत श्रीमंतांना मुजरा करण्याकरिता दरबारात जात असत, तोच हा दिल्ली दरवाजा आज शुक्क व उजाड झालेला पाहून कोणत्या अस्सल बीज महाराष्ट्रीयाचे विचार गत वैभवाची व प्रस्तुत स्थितीची तुलना करण्यात गुंतणार नाहीत? कोणत्या कवीची काव्यस्फूर्ती :-
तिथें मेजवान्यावरी मेजवान्या । नरेशें दिल्या `पाहिजे तेहि न्या न्या’ ।।
अंशी कर्ण दात्यावरी ताण झाली । तिथें मृत्यू अन्नामुळे धाड घाली ।।
अशी एकादी कविता प्रसवल्याशिवाय राहिल? महाराष्ट्रीय वैभवाची टोलेजंग इमारत हां हां म्हणता एका निमिषार्धात यक्षिणीची कांडी फिरल्याप्रमाणे जिथल्या तिथे नष्ट होऊन तिच्या जागी निकृष्ट दारिद्र्याच्या धुळीचे प्रचंड पर्वत येऊन कसे पडले, याबद्दल आश्चर्यचकित होऊन तटस्थ उभा राहिलेला तट; आजापणजांनी रक्ताचे पाणी पाणी करून, समरांगणातल्या जखमांची क्षिती न बाळगिता, रक्ताच्या पुरात प्रेतांवरून घोडे उडवून आणि धारातीर्थात आपल्या पोटच्या गोळ्यांना बळी देऊन सर्व महाराष्ट्रीयांची अब्रु राखण्याकरिता स्वक,टाने मिळविलेला जरतारी भगवा झेंडा त्याच आजा पणजाच्या कृतघ्न नातवांनी आपल्या हातांनी उपटून फेकून दिला, म्हणून आपल्या दुर्दैवाबद्दल खंती करीत झुरत बसणारे ते बुरूज; छत्रपति शिवाजी महाराजांच्या व श्रीरामदासाच्या पुण्य प्रतापावर ब्राह्मणपदपाच्छाईच्या नरवीराने उभारलेल्या शनिवार राजमहालाची रक्षा पाहून डोळ्यांतून टिपे गाळणारे ते अनेक दरवाजे, प्रेक्षकांच्या मनाची काय बरे स्थिती करतात? राजनिष्ठेचे मूर्तिमंत पुतळे, स्वामिभक्तिसाठी स्वप्राणाची आहुति देणारे वीर, मुत्सद्दीपणात गाजलेले फडणीस, स्वतेजाने प्रभूची कीर्ती उज्वल करणारे गोखले, ज्यांना पहावयाचे असतील त्यांनी या पुण्यभूमीची यात्रा एकवार करावी.
तेथल्या रहिवाशांना या तीर्थाची तर क्षितीच नसते. तथापि नाशिकचे लोक काशीच्या गंगेसाठी धडपडतात आणि काशीचे रहिवाशी नाशिकच्या गंगेत बुचकळी मारायला धावत येतात.
जुन्या इमारतींविषयी ख्यात असलेली प्राचीन मोंगलाईची राजधानी विजापूर हे एक राष्ट्रीय शिक्षणाच्या विश्वविद्यालयाचे आद्यपीठ आहे. तेथील मुके गुरू पुण्यभूमीप्रमाणेच वैभवाचे व वीरश्रीचे शिक्षण तर देतातच, पंरतु कलाकौशल्याची चमक जशी त्यांच्या व्याख्यानांत असते तशी इतरत्र दिसणे शक्य नाही. मुलूखमैदान नावाची पंचधातूची आक्राळविक्राळ तोफ पाहताच कलाकुसरीबद्दल घमेंड मारणारे यांत्रिक शोधांचेजनक इंग्रज, जर्मन व अमेरिकन तोंडात बोट घालून चकभूल झाले. ही तोफ एकदाच काय ती उडाली. तेव्हा रंजूक लावणारा तर मेलाच, परंतु जो गोळा उडाला तो २४ मैलांवर जाऊन पडला. तोफेच्या दणक्याने १२ कोसांतील प्राण्यांच गर्भपात झाले खरे, परंतु तिच्या `मुलुखमैदान’ नावाने पृथ्वीवरील सर्व खंडातल्या यच्चयावत यांत्रिक शोधकांच्या उरात कायमची धडकी भरविली आहे. इभ्राहीम रोझा मशिदीच्या सभा मंडपांत असलेली एका दगडाची खोदीव झुलती साखळी पाहिली असता त्यापुढे राजाबाई टॉवरचे कालकौशल्य फिकेच पडते. बोळघुमटातील स्वयंभू टेलिफोन, सातवेळा उठणारा प्रतिध्वनि, उपल्या बुरुजावर चढविलेली प्रचंड तोफ इत्यादि गोष्टी शिक्षण घेण्यासारख्या आहेत. अशा रीतीने सर्व हिंदुस्थानात ठिकठिकाणी कितीतरी स्थळे आहेत त्यांचे वर्ण स्थलसंकोचासाठी जेथच्या तेथे ठेवणे भाग आहे. असल्या मुक्या गुरुमालिकांची नीट तरतूद ठेवण्याबद्दल आमचे सरकार फार झटते याबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत.
मावळातील तोरणचा किल्ला आपली निशाणाची मोडकी काठी दाखवून मराठी राज्याची स्थापना प्रथम येथे झाली हे दाखवील. कोल्हापुरातील दवाखान्याच्या कंपौडासाठी खाली तोंड करून गाडलेल्या असंख्य तोफा कोल्हापूरची गादी स्थापन करणा-या श्री. ताराबाईच्या वेळच्या सर्व ऐतिहासिक कथा अजून सांगतात. कर्नाटकातील बेलवाडीचा भुईकोट किल्ला सावित्रीबाई ठाणेदारणीचे शौर्य, पतिभक्ती व स्वामिनिष्ठा मूर्तिमंत नजरेस आणून दाखवितो. पावनखिंडीत प्रभु बाजी देशपांड्याची उत्कट स्वामीभक्ति तेथल्या प्रत्येक मृत्तिकेच्या कणाकणात सरसलेली दिसेल. सिंहगडावरील अर्धंद्राकृतीच्या हिरव्या निशाणाला जमानदोस्त करून त्या ठिकाणी भगवा झेंडा उभारता उभारता धारतीर्थात पतन पावणारा नरसिंह तानाजी मराठेशाहीची स्थापना करण्यास शिवबाने किती अश्रांत श्रम केले हे सांगण्यास अजूनही बोलेल आणि पानपतच्या भारतीयुद्धात पतन पावलेल्या विश्वासभाऊच्या मरणाबद्दल सूड उगविण्यासाठी युद्धावेशात डोळे लालबुंद करून, ज्याने घोड्यावर कसलेला जीन तीन दिवसांत अटकेला भिडविला आणि पळून जाणा-या अहमदशहा अबदल्लीच्या छातीवर बसून कट्यारीने कंठ कापला व त्याच्या रुधिराच्या आकंठ प्राशनाने सूडाची भरपाई करून घेतली त्या राघू भरारीचा पराक्रम अटकेच्या किल्ल्याच्या चि-यांचि-यांतून अजून आरशाप्रमाणे स्पष्ट दिसेल.
[वन्दे जिनवरम्. सन १९०८]
लेख १३
धन्य पार्वतीबाई धन्य
नारियोंकु निंदो नहीं नारी नरकी खान ।
जिस खानिसे पैदा हुवे राम कृष्ण हनुमान ।।
`यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः’ या सूत्राचा अवमान ज्या घटकेपासून भरतपुत्रांनी करण्यास सुरुवात केली त्या घटकेलाच त्यांच्या राष्ट्रीय वैभवाची माती झाली. आता ज्या क्षणापासून पश्चात्तापित भारत स्त्रीवर्गाच्या उन्नतीचा प्रश्न हाती घेईल त्या क्षणीच त्याने उद्याच्या साम्राज्याचा पाया ठोकला असे समजावे. `अबलोन्नती’ हा संधी कोणत्या शहाण्याने केला असेल तो असो, स्त्रियांना `अबला’ म्हणण्यातच सत्याचा खून पाडण्याचे दुष्ट कृत्य आपण करीत आहोत, याची त्या शहाण्याला दाद नसावी असे वाटते. स्त्रिया अबला असतात की सबला असतात हे इतिहास शिकवील. परंतु स्त्रियांना अबला करून मग त्यांच्या उन्नतीबद्दल गुजराथी रडगाणे गाण्यात मोठासा सबळ पुरुषार्थ साधेल असे मुळीच नाही. उलट त्यांना अबला म्हणणे व त्यांच्या उन्नतीकरिता प्रयत्न करण्याची शेखी मिरविणे यांत, आणि एखाद्या जेत्याने जित राष्ट्राला बतबल करू नंतर स्वराज्याच्या हप्तेबंदी खुराकावर त्याला सज्ञान, सशक्त व स्वावलंबनी करणे यात विशेष फरक तो काय? स्त्रीवर्गाचा औपनिषदिक व भारतकालीन इतिहास पाहिला तर त्यांची कर्तबगारी सर्वशक्तिपूर्ण व मर्दपणाचा टेंभा मिरविणा-या पुरुषांपेक्षाही सामर्थ्वान असल्याचे डोळसाला स्पष्ट दिसेल. परंतु त्यांचा अवमान करण्याची अवदसा ज्या वेळी पराभूत पुरुष वर्गाला आठवली त्याच वेळी त्यांना अबला ही संज्ञा लावण्याचे मुर्दाड धाडस जन्माला आले. ते काहीही असो, स्त्रियांच्या उन्नतीचा प्रश्न आता राष्ट्रीय चळवळीतील एक अत्यंत महत्त्वाचा भाग होऊन राहिला आहे ही मोठ्या आनंदाची, त्याचप्रमाणे अभिमानाची गोष्ट आहे, गेल्या अर्धशतकात प. वा. डॉ. आनंदीबाई जोशी या विदुषीपासून तो तहत् विद्यमान श्री सरोजिनी नायडू पर्यंतच्या सबला भगिनींनी आपल्या उदात्त चारित्र्याने अकल्प्य धाडसाने व कौतुकास्पद बुद्धिसामर्थ्याने असे सप्रमाण पटवून दिले आहे की औपनिषदिक इतिहासाची पुनरावृत्ती या भरतखंडात लवकरच होणार. जुन्या इतिहासात रजपूत स्त्रियांच्या धाडसी पराक्रमाच्या अनंत गोष्टी आपण वचतो. जोहारासारख्या अमानुष यज्ञात त्यांनी आपल्या सर्वस्वाचा आत्मयज्ञ केल्याची उदाहरणे वाचून व ऐकून आपल्या हृदयात खेदमिश्रित कुतूहलाच्या उर्मी उठतात. परंतु सात समुद्र उल्लंघन करून बौद्धिक सामर्थ्याच्या जोरावर अहंमन्य पाश्चात्यांच्या छावण्या भराभर काबीज करून, हिंदु संस्कृतीचा, हिंदू तत्त्वज्ञानाचा व हिंदुधर्माचा झेडा त्यांच्या नाकावर टिच्चून उभारून मायदेशाची वर्णनीय कामगिरी करणा-या डॉ. आनंदीबाई, श्री. सरोजिनीबाई, या विदुषींप्रमाणेच भारतीय इतिहासाला आमच्या भगिनी पार्वतीबाई जर आठवल्या नाहीत तर तो इतिहास कशाचा? श्री. पार्वतीबाई या काही वर्षांपूर्वी प्रो. कर्व्यांच्या इंडियन विमेन्स युनिवर्सिटी तर्फे पाश्चात्य देशातील लोकमत जागृत करण्यासाठी अमेरिकेला गेल्या होत्या, त्या नुकत्याच तिकडे व युरोपात दिग्विजय मिळवून स्वदेशी परत आल्या आहेत. पार्वतीबाईंचा पूर्व इतिहास आणि आता अमेरिका, इंग्लंड, पारीस सारख्या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या कर्तबागारीवर मिळविलेल्या दिग्विजयाचा इतिहास जो कोणी लक्षपूर्वक तुलना करून पाहील, तोदेखील आमच्याप्रमाणेच स्त्रियांना अबला मानणा-या शहाण्याचे कान उपटायला कमी करणार नाही. हिंदी स्त्रियांच्या वतीने केवळ स्वावलंबनाच्या जोरावर पार्वतीबाईंसाख्या `यःकश्चित्’ दिसणा-या एका हिंदू विधवेने अमेरिकेला जाण्याचे धाडस करावे, ठिकठिकाणी अनेक व्याख्याने देऊन तिकडील लोकमत जागृतीच्या कामधेनूपासून फंड गोळा करून इकडे युनिव्हर्सिटीकडे पाठवावा आणि हिंदी स्त्रियांच्या उन्नतीकडे अमेरिका, इंग्लिश, फ्रेंच राष्ट्रांचे लक्ष वेधावे, ही असामान्य कामगिरी बजावणारी स्त्री व शिवछत्रपतीची माता जिजाबाई किंवा राघोबा दादाच्या हातात काकणे भरणारी अहिल्याबाई यात आम्हाला तरी काही भेद दिसत नाही. कार्याचे स्वरूप भिन्न असले तरी त्याच्या महत्त्वाचा कस केव्हाही एकजनिसीच असतो. पार्वतीबाई अमेरिकेला गेल्या तेव्हा त्यांना प्रो. धर्मानंद कोसंबी यांची न्यूयॉर्क पर्यंत सोबत लाभली. परंतु तेथे त्यांनी पार्वतीबाईला सोडल्या दिवसापासून त्यांची वार्ता इकडे काहीच नव्हती. मध्यंतरी आम्ही आमचे परमित्र प्रो. चिपळूणकर यांच्यापाशी त्यांची विचारपूस केली, तेव्हा त्यांच्याकडूनही काही कळेना. ते म्हणाले, How could we trace a drop in that unfathomable ocean of Ameraca – त्या अमेरिकेच्या महासागरात या थेंबाचा पत्ता आपणास कसा लागणार? परंतु धन्य आमचा प्यारा हिंदुस्थान!
त्याची कर्तबगार कन्या असे हजारो महासागर रोंरावत तिच्यावर कोसळले म्हणून ती थोडीच बुडणार आहे! हिंदुस्थानची संस्कृती कच्च्या कुंभाराची कच्ची माती नव्हे! हिंदु तत्त्वज्ञान उप-या भुसा-याच्या वखारीतले भुसाचे पोते नव्हे. हिंदू धर्म हा गुलामांचा धर्म नव्हे. विष्णुगुप्त चाणक्याचे सूत्र पहा. चाणक्य ठणकावून सा-या जगाला सांगतो की `न तु एव आर्यस्य दासभावः’ आर्यजन कधीही कोणाचे गुलाम होणार नाहीत. मग ही आमची पोलादी निश्चयाची आर्यकन्याच अमेरिकेच्या पचनी पडणार कशी? आर्य ह्या शब्दांतच साम्राज्यनेतृत्व रसरसत आहे. आर्यजननीच्या अभिमानी लेकरांनी आपला आत्मघातकी; संकुचित बाणा दूर झुगारून देऊन, धार्मिक, सामाजिक व राजकीय गुलामगिरीचे पाश तडातड तोडून किंचित सीमोल्लंघन करण्याची तडफ दाखवावी की दिग्विजयश्रीने माळ घातलीच म्हणून समजावे. दिग्विजय हा हिंदुस्थानचा कर्मसिद्ध हक्क आहे; म्हणूनच गेल्या तीन हजार वर्षांच्या अवधीत शेकडो भिन्न भिन्न संस्कृत्या जगतीतलावर कालवशात मृत्यू पावल्या; पण हिंदू संस्कृती अजूनही काळाला टक्कर देऊन ताठ आहे तशीच उभी आहे. निराशावाद्यांनी या प्रमेयावर किंचित डोके खाजवावे अशा प्रबोधनाची प्रार्थना आहे.
[प्रबोधन, १६-१०-२१]
लेख १४
अटकेला फडकलेला भगवा झेंडा
``Cease to consul, the time for Action clall;
War, horried war, approaches to your walls.’’
- Pope, Iliad, book II, I.967
*४ भगवा झेंडा! या नावात एकेक काळी मोठा करडा वचक भरलेला होता. याच शब्दांत पूर्वी एक प्रकारचा अभिमान चमकत होता. याच शब्दोच्चाराने १७वे व १८वे शतक जगाच्या इतिहासात गाजले गेलेले आहे. एक `भगवा झेंडा’ उद्गार तोंडातून बाहेर पडताच मनात नानाप्रकारच्या कल्पनांचे काहूर उठून दृष्टीसमोर अद्वितीय नरनारीच्या अनंत मूर्ती मूर्तिमंत उभ्या राहतात. इतिहास ग्रंथातून असा एक काळ ग्रथित केलेला आढळतो की, त्या काळी भगवा झेंडा हे नाव ऐकताच कितीतरी देशचे राजेराजवाडे एकसहा थरथरा कापत असत. हाच तो भगवा जरीपटका की, ज्याच्या गंभीर नावाच्या गर्जना कानी पडताच मराठे वीर आपसातील सर्व द्वैतांना तिलांजुली देऊन, आपल्या हातात आपली शिरे घेऊन, `हरहर महादेव’ची प्रतिगर्जना करीत झेंड्याच्या हत्तीला गराडा देऊन उभे राहत असत. याच भगव्या झेंड्याने एके समयी महाराष्ट्र वीराच्या अंगतील अंगरख्यांचे बंद तटातट तोडले. याच जरीपटक्याने तत्कालीन अनेक नरश्वानांना श्वानवृत्तीपासून परावृत्त करून त्यांना ख-या राष्ट्रसेवेची चटक दाखविली. आणि याच महाराष्ट्रीय निशाणाने पुणे, सातारा इत्यादि शहरांना राजधानीचे पूर्ण वैभव दाखवून त्यांना इंद्रपुरीची बरोबरी करावयास पात्र केले. गोवध करण्यास सोकावलेल्या इराणी, दुराणी, म्लेंच्छांच्या हृदयात कायमची धडकी भरवून, देवळांच्या ठिकाणी शुभअ मशिदीचे घुमट उभारणा-या तत्कालीन विधर्माभिमानी महमदीयांना आपल्या उज्वल पराक्रमाच्या तेजाने दिपवून टाकणारा जरतारी झेंडा हाच. सनातन धर्मोच्छेदाच्या काळ्याकुट्ट रात्रीचा गडद अंधकार नाहीसा करणारा तेजस्वी सूर्य हाच.
या भगव्या झेंड्याने तीन शतकातल्या सर्व गोष्टी स्वतः प्रत्यक्ष पाहिल्या आहेत. श्रीरामदास स्वामींच्या समर्थ छत्राखाली झालेल्या महाराष्ट्र धर्माची प्राणप्रतिष्ठा व शिवाजीने स्वराज्यस्थापनेच्या केलेल्या उपक्रमाचा उषःकाल; छत्रपति शाहू सातारकर, बाजीराव पेशवे, यांच्य कारकीर्दीतील राज्यवैभवाची प्रभात; नानासाहेब व माधवराव पेशव्यांच्या वेळची मध्यान्ह; मध्यंतरीच लागलेली पानपत युद्ध व नारायणराव पेशव्याचा खून इत्यादी खग्रास सूर्यग्रहणे; सवाई माधवराव पेशव्यांनी शनवार वाड्यात तिस-या मजल्यावरून आत्महत्येकरिता खाली कारंजावर उडी टाकून केलेला वैभव रवीचा अन्त, अर्थात सायंकाळ; आणि रावबाजीची पळापळीची, लाडवांच्या युद्धांची आणि शेवटी पेशवाईला राम राम ठोकून ब्रह्मावर्ती पेन्शन खात बसण्याची अंधारी रात्र; इत्यादी विविधकाळवैचित्र्य त्याने स्वतः अनुभवलेले आहे. याशिवाय त्याने अनेक महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या त्या इतिहासवाचकास अवगतच आहेत.
भगवद्भक्त महासाधु तुकारामाची अभंगवाणी त्याने भीवरेच्या तीरी हरिनामाच्या कल्होळासह ऐकिली. रामदासी मनाचे श्र्लोक जनांच्या काळजाला भिडून `मराठा तितुका मेळवाव!’ असल्या राष्ट्रकल्पनांच्या धर्मतत्त्वांचा प्रचंड झंजावात आसेतुहिमाचल भरा-या मारताना पाहिला. लाखो श्रोतृसमुदायापुढे रामजोशी आपल्या पासादिक लावण्या मोठ्या रंगात येऊन हावभाव नृत्य करून म्हणताना त्याच्या डफाची खणखणीत थाप ऐकून त्याने मोठ्या आनंदाने कित्येकवेळा मान तुकवली. आनंदफंदीच्या लावण्या, गोंधळी, शाहिरांचे पोवाडे, पेशव्यांच्या दरबारी गणेश महालात सुरू असताना; मराठे वीरांच्या `हरहर महादेव’च्या आरोळ्यांनी गजबजलेला तो वीरश्रीचा रंग आमच्या भगव्या झेंड्याने दिल्लीदरवाजावर मोठ्या डौलाने डुलत राहून ऐकला. तुळजापुरच्या भवानी देवीला जात्यात घालून भरडणा-या अफजुलखानाची-भटा-याच्या पोराची-आतडी शिवाजीने बाहेर काढतेवेळीचा तो भयंकर देखावा याने पाहिला. पावनखिंडीत तोफेचा गोळा लागून गतप्राण झालेल्या बाजी देशपांडे सरदाराच्या पाठोपाठ युद्धास भिडलेल्या मावळे गड्यांनी भिर्र भिर्र फेकलेल्या दगडांचा आवाज व गोफणींचा गुं गुं ध्वनि रोंरावत असताना त्याने ऐकिला.
संभाजीचा खून, शाहू महाराजांच्या `झिप्र्या’ कुत्र्याची स्वामिभक्ति; बाजीराव पेशव्याची मराठमंडळ (Maratha Confederacy) स्थापन करून सर्व जातींना अद्वैतभावाने वागविण्याची थोर बुद्धि, नानासाहेबांच्या कारकीर्दीत सुरू झालेला द्वैतभाव; माधवराव पेशव्यांनी शिंदे, होळकर, नागपूरकर भोसले इत्यादि शिरजोर झालेल्या सुभेदारांवर ठेवलेला करडा वचक; सुमेरसिंगाच्या तलवारीला बळी पडलेल्या नारायणराव पेशव्याच्या रक्ताच सडा, त्यादि अनेक गोष्टी या जरीपटक्याने प्रत्यक्ष पाहिल्या. धी ईस्ट इंडिया कुंफणी सरकारचे पेशव्यांच्या दरबारातले वकील मालीट साहेब यांनी, पेशवाई साम्राज्यावर आपल्या शाबरी मंत्राचा पगडा चांगलाच बसला आहे, अशा घमेंडीत अचाट बुद्धि चालवून मुंबईहून दररोज पुण्यास बिस्कुटांनी भरून येणा-या तीन मेण्यांपैकी एकात दोन जंबुरे (तोफा) छपवून आणण्याचा जो उपक्रम केला आणि नाना फडणविसाने एकदम हुकूम सोडून तोच मेणा खोपवलीच्या घाटावर जप्त करून पाडला असता, साहेब बहादुरांची नानांच्या समोर जी तिरपीट उडाली तीही याने पाहिली.
अशा रीतीने सुमारे दोनअडीचशे वर्षे महाराष्ट्र राज्यवैभवाचे सौख्य भोगून शेवटी आपआपासातल्या द्वैताची घरातल्या घरात आग भडकल्यामुळे, काळाची वक्रदृष्टी त्यावर फिरताच, या थोर भगव्या झेंड्याला दिल्ली दरवाजाच्या अत्युच्च शिखरावरून निमूटपणे खाली उतरावे लागले. त्याच दिवशी राज्यलक्ष्मीच्या कृपादृष्टीतून सर्व हिंदी राष्ट्रही उतरले. जरीपटका जो खाली उतरला तो रसातळालाच गेला. रावबाजीप्रमाणे तो पेन्शन खात बसला नाही. आताहा भगवा झेंडा अटकेला कसा फडकला याची थोडी हकीकत सांगून आटोपते घेऊ.
सोनपत पानपतची लढाई बहुतेक आटोपलीच. दोन मोत्ये गळाली, सत्तावीस मोहोरा हरपल्या आणि रुपये खुर्दा किती हरवला याची गणतीच नाही, अशी हृदयद्रावक बातमी श्रीमंत नानासाहेब पेशव्यांस अहमदनगरास एका व्यापा-याच्या जासुदाकडून कळली. त्याच दिवशी श्रीमंताच्या छावणीत मकर संक्रांतीच्या भोगीच्या सणाची मोठी गडबड चालली होती. राजस्त्रिया, सरदारपत्न्या, दासी सगळ्यांची अभ्यंग स्नानाची तयारी चालली होती. कित्येकजणी न्हाऊन अंग पुशीत होत्या, कित्येक न्हात होत्या, कित्येक एकमेकींच्या थट्टा करण्यात, अंगावर उत्तर, गुलाबपाणी फेकण्यात आणि कित्येकजणी पानपतास गेलेल्या योद्ध्यांच्या व विश्वासराव, भाऊसाहेब, लक्ष्मीबाई, पार्वतीबाई यांच्या आठवणी काढून `ते सगळे युद्धात विजयी होऊन त्यांच्या छावणीचा तळ जर इतक्यातच नगरास येऊन दाखल झाला तर काय मौज होईल’ वगैरे गोष्टी बोलत हासत खेळत होत्या. इकडे नानासाहेब पेशवे आपल्या सर्व सरदारांना एकत्र जमवून भाऊच्या मदतीला सैन्य घेऊन जायचे, ते कोणकोणच्या टप्प्यांनी न्यायचे, इत्यादी बुद्धविषयक गोष्टींच्या खलबतात गुंतले होते. दुसरीकडे श्रीमंतांची अर्धांगी श्रीमती गोपिकाबाई या अभ्यंगस्नानास बसल्या आहेत, म्हणून मंगलदर्शक वाद्ये वाजताहेत व तोफांची धडेबाजी सुरू आहे. या समारंभाच्या आदल्या रात्री या श्रीमंत दांपत्याला अशुभसूचक वाईट स्वप्न पडले असल्यामुळे, त्या दोघांची मने मात्र अगदी उदास होऊन त्यांच्या ध्यानीमनी विश्वास, भाऊ, लक्ष्मी, पार्वती या जोडप्यांवाचून दुसरा कोणताच विषय घोळत नव्हता आणि त्यांच्या दृष्टीसमोर त्यांच्याशिवाय दुस-या कोणत्याच मूर्ती दिसत नव्हत्या. इतक्यात त्या नगरच्या व्यापा-याने वरील संदेसाची चिठ्ठी एका हलका-याबरोबर पेशव्यांकडे पाठविली. चिठ्ठी दाखल होताच सर्वांना असे वाटू लागले की, त्यात मोहिमेचा जय झाला असे शुभ वर्तमान लिहिलेले खास असेल. हिंदुस्थानातून बातमी घेऊन हलकारा आला, ही बातमी हां हां म्हणता बायकात पसरली. आता मोहिमेचा विजय ऐकायला मिळेल, म्हणून जो तो उत्सुक होऊन आपापसात कुजबुजू लागला. परंतु त्या बिचा-यांना पुढे ओढवलेल्या संक्रांतीच्या भोगीची-नव्हे भोगाची- काय कल्पना? चिठ्ठी वाचताच नानासाहेब पेशवे एकदम काळेठिक्कर पडले, त्यांचा ऊर भरून त्यांना चक्कर आली आणि मोठ्याने `भाऊ, विश्वास, गेला हो गेला!’ अशी आरोळी मारून बेशुद्ध पडले. गोपिकाबाईंचे स्नान होऊन त्या रुप्याच्या चौरंगावर उभ्या राहून आपले ओले केस पुशीत होत्या. इतक्यात वरील आरोळी त्यांच्या कानी पडली. `भाऊ विश्वास’ हे शब्द त्यांच्या कानात रसरसलेल्या शिशाप्रमाणे जाऊन अंतःकरणात जबरदस्त धक्का बसला आणि ती `माझ्या विश्वासा’ अशी किंकाळी फोडून धाडकन् उभ्यानेच खाली पडली.
झाले! या श्रीमंत दांपत्याला सावध करण्यात आणि त्यांना धीर देण्यात जिकडे तिकडे कच गडबड धांदल सुरू झाली. पण त्यांचा शोक कशाने आवरणार? त्याच स्थितीत सर्व छावणी परत पुण्यास आली. पुण्यास दाखल होताच सर्व शहर व सर्व महाराष्ट्र देश महाशोकात निमग्न झाला. का होऊ नये? पानपती महाराष्ट्राची तीन लाख बांगडी फुटलेली! सर्वत्र उदासीनता पसरली. परंतु संकट प्राप्त झाले असता नुसते रडणे, हातबोटे चोळणे किंवा निषेध प्रदर्शित करणे या आधुनिक रीत आताप्रमाणे त्यावेळी अस्तित्वात नव्हत्या. त्यावेळी तरवारीचे साम्राज्य होते. प्रजा निःशस्त्र झाली नव्हती. तिच्या डोळ्याला सनदशाहीचा चष्मा लागला नव्हता. महाराष्ट्राची रास सांप्रत मेष आहे – म्हणजे ते मेषपात्र आहे. त्यावेळी महाराष्ट्रावर सिंह राशीचा पगडा पूर्ण असल्यामुळ राजा व प्रजा नेहमी सिंहवत् तेजस्वी व पराक्रमी असत. त्याच नरसिंह समूहातून वरील संकटाची वार्ता एकताच राघु भरारी हाएक खवळलेला सिंह दांतओठ खात शत्रूचे नरडे फोडण्याच्या त्वेषाने खाडकन् समशेर परजीत बाहेर पडला. रणवाद्यांच्या शिंगांचा ध्वनी व दुंदुभीचा दुढूम् दुढूम् आवाज ऐकताच हां हां म्हणता हजारो मराठे वीर आपापल्या समशेरा बाहेर खेचून घोडे पिटाळीत जरीपटक्याच्या भोवती जमा झाले. विश्वास व भाऊच्या मरणाबद्दल रघुनाथराव गिलच्यावर स्वारी करून त्याची हाडे कडकडा फडण्यासाठी उदईक निघणार, ही बातमी सर्व पुणे शहरात पसरली. वृद्ध त्याला आशीर्वाद देऊ लागले. तरणेबांड जवान गडी मोहिमेच्या फौजेत सामील झाले. उदयीक गारपीराहून कूच करण्यासाठी शनवारवाड्यातून `गिलच्या म्हणजे काय बिशाद काय? एका ठोशासरसा जमीनदोस्त करीन’ अशी गर्जना करीत खवळून बाहेर पडणा-या राघुभरारीला मंगलदायक पंचारती वाळण्याकरिता सर्व स्त्रिया पंचारत्यांचे साहित्य सिद्ध करू लागल्या; आणि आमचा भगवा झेंडा तर कधीच – आदल्या दिवशीच – गारपीरावर जाऊन उत्तरेकडे आपले तोंड फिरवून भावी युद्धातील वीरश्रीचा पुतळा आणि विजयदेवतेचा तिलक राघोबा कूच करण्याचे शिंग केव्हा फुंकतो याची वाट पाहत उभा राहिला.
श्रीमंत नानासाहेब आणि श्रीमती गोपिकाबाई पुत्रशोकाने ग्रस्त होऊन गेल्या होत्या. रात्री नानासाहेबांचा निरोप घेण्याकरिता राघोबाची स्वारी त्यांच्या महालात गेली. आधीच विश्वासासारखा अभिमन्युवत् मोहरापुत्र, भाऊसाहेबासारखा कर्णवत् योद्धा चुलतभाऊ, काळमुखी पडले असता, त्याच काळाच्या मुखात प्रत्यक्ष पाठच्या भावाला जाण्याची परवानगी देण्याचे काम नानासाहेबास किती जाचक झाले असेल, याची कल्पना वाचकांनीच करावी. नानासाहेबाच्या तोंडातून एक अक्षर निघेना. त्यांनी कसाबसा निरोप दिला. राघोबानेही त्याच निरोपाला शिरसावंद्य मानून `मारीन पन्नग मी फोडिन शेपटाळू भूगोल हा उलथिता मज नाहि वेळू’ अशा अर्थाचे वीरश्रीपूर्ण भाषण करून त्यांचा निरोप घेतला. नंतर `विश्वास-विश्वास’ करीत पुत्रशोकाने झुरणीस लागलेल्या गोपिकाबाईंची समजूत घालण्याकरिता रघुनाथराव गेले. रघाथरावाला पाहताच गोपिकाबाई स्फुंदत डोळे पुशीत उभ्या राहू लागल्या.
राघोबा :- वहिनी, उभे राहण्याचे कारण नाही. मी आपल्या मुलासारखा बसा खाली. हे पहा, मला आता बोलायलाच वेळ नाही. आता वघी घटका उरली. गारपिरावर मंडळी वाट पहात असतील.
गोपिका :- म्हणजे?
राघोबा :- विश्वास व भाऊ यांच्या मृत्यूबद्दल सूड उगविण्याकरिता उत्तरेकडचे समरांगण माझी वाट पहात आहे. मला आपला आशीर्वाद असावा. झाल्या गोष्टी होऊन गेल्या. पण ज्या गिलचाने आमच्या महाराष्ट्राचा आधारस्तंभ विश्वास आणि श्रीमंतांचा पाठिंबा रणशूर भाऊ यांचा घात केला, त्या अहमदशहाचा कंठ चरचर चिरून त्याच्या रक्ताने विश्वास-भाऊंना ओंजळीओंजळीने अर्घ्य देणार आणि अपु-या इच्छsने मरण पावलेले त्यांचे आत्मे शांत करणार, तेव्हाच हा रघुनाथ फिरून आपल्याला तोंड दाखवील. हा वाघ जिवंत असताना ते लांडगे गिलचे माझ्या कच्च्याबच्च्यांची कत्तल करतात काय? माझ्यात बाबांच्या वीरश्रीचे जर काही पाणी असेल, तर त्यांच्या पायांच्या पुण्याईने आणि तुम्हां दोघांच्या आशीर्वादाने त्या गिलच्याला लाथेच्या ठोकरीसरसा जमीनदोस्त करीन. येतो मी आता. छत्रपती शिवाजी महाराज सर्व समर्थ आहेत.
गोपिका :- - पण –
परंतु `पण’ ऐकायला तेथे कोण होते? राघोबा एकदम तडफेसरसे बाहेरच पडले. या वेळी पहाटेचा चौघडा झडू लागला होता. रघुनाथराव बाहेर पडले, ते दिल्ली दरवाजाशी तयार असलेल्या घोड्यावर चढले. घोड्याचा लगाम एकदा खेचून त्यांनी आपल्या कुलदैवतांचे, छत्रपतीचे आणि पेशव्यांच्या गादीचे चिंतन करून एकवार वर मान करून दिल्ली दरवाजावर फडकत असलेल्या भगव्या झेंड्याला आणि जरीपटक्याला समशेर वाकवून मुजरा केला आणि एकदम ``छत्रपती शिवाजी महाराजकी जय!’’ ``हर हर महादेव’’ची प्रचंड गर्जना करून आपले लष्कर घेऊन एकदम गारपीरावर दाखल झाले. तेथे येताच ताबडतोब कूच करण्याचा नगारा झाला आणि सर्व सैन्य वायूच्या वेगाने उत्तरकडे चालते झाले.
मजल दरमजल करीत स्वारी जयपुरला दाखल झाली. अहमदशहाला पानपत युद्धात जरी विजय मिळाला होता, तरी पण त्याचे नुकसानही तसेच भयंकर झाले होते. पोटचे प्रत्यक्ष दोन मुलगे व एक जावई लढाईत पडले; लाखों शिपायांची कत्तल उडाली आणि कल्पनातीत संपत्तीचाही चुराडा झाला. जेमतेम बेतापुरते सैन्य घेऊन तो स्वदेशी चालला होता. इतक्यात त्याला भरारीची भरारी आली असे वर्तमान कळले मात्र, तोच तो खचला. रागारागाने दाढी तोडीत तो म्हणाला, ``या इलाही! अब क्या करूं? इस शैतानके हातसे मेरेकू कौन बचावेगा? भरारी, वो शैतान भरारी, बेशक मेरी जान लियेबगर नहि छोडेगा’’ त्याची स्वारी सिंधूनदी आणि काबूल नदी यांच्या संगमावरच्या अटकेपर्यंत जाऊन पोचली, अशी बातमी राघोबाला मिळताच त्याने एकदम जरीपटक्याचा हत्ती त्या दिशेकडे फिरविण्याचा हुकूम फर्मावला. टांकोटांक भरारीची वायूगतीची भरारी अहमदशहाच्या सैन्याला जाऊन भिडली! सैन्य दृष्टीस पडताच राघोबाने मोठी आरोळी मारून भयंकर गर्जना केली - ``हरामखोरा, अहमद्या उभा रहा. सिंहाला सतावून घरी जिवंत पळतोस काय?’’ गर्जना कानी पडताच शहाचा प्राण निम्मे गेलाच. हल्ला सुरू झाला. तलवारीवर तलवारी खणखणू लागून त्यातून विस्तवाच्या ठिणग्या पडू लागल्या. प्रेतांचे ढिगावर ढीग पडू लागले. राघोबाची स्वारी उमाळी सरशी शहाच्या तंबूत घुसली. त्याला त्वेषाने तंगडी धरून कोटावरून खाली ओढून तो शस्त्र सावरतो न सावरतो तोच छातीवर एक लाथ मारून भरारीची स्वारी त्याच्या उरावर बसली. ``सर्व अपराधांचे एकवार स्मरण कर’’ म्हणून त्याला दरडावून सांगून स्वारी लालबुंद डोळे करून त्याच्याकडे पाहू लागली. प्रत्यक्ष कृतांत काळाच्याही डोळ्यात इतकी तेजस्विता व क्रूरता बसत नसेल, असे त्यावेळी शहास वाटले. तो अगदी अर्धमेला होऊन गेला. राघोबाचे ते डोळे सूडाचा मूर्तिमंत अग्नीच ओकत होते. ``अहमदशहा! हा पहा राघू भरारी तुझ्या अपराधाबद्दल तुझा सूड घ्यावयाला तुझ्या नरड्यावर बसला आहे. दत्ताजी शिंदे, जनकोजी शिंदे, विश्वासराव, भाऊसाहेब यांच्या मृत्यूबद्दलचा सूड आज तुझ्या नरड्यातील रक्त घटघट पिऊन मी शांत करतो पहा.’’ असे म्हणून शहाच्या कंठावर कट्यार फिरविली. रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. राघोबाने एकदम त्याच्या नरड्याला आपले तोंड लाऊन रक्त पिण्यासाठी आपला आ पसरला, तोच पाठीमागे असलेल्या रणजितसिंग नावाच्या रजपूत सरदाराने त्यांना आवरून धरले. शहाच्या सर्व सैन्याचा फडशा उडाला आणि अशा रीतीने मराठ्यांचा भगवा झेंडा अटकेला फडकला.
[मुंबई, राष्ट्रमत, १९०७]
लेख १५
उत्तिष्ठत, जाग्रत! उठा, जागे व्हा!!
अमृताची रुची, स्वर्गातले सौख्य, कामधेनूचे रत्नभंडार आणि कल्पवृक्षाचा इच्छाफलदायी पराक्रम यांच्या कल्पना अनेक पुराणकारांनी वर्णिल्या, पण त्यांची प्रत्यक्ष प्रतचिती मात्र कोणीही, खुद्द पुराणकारांनीसुद्धा, घेतल्याचा दाखला नाही. मानवी जीवनाच्या ओघावर नुसती ओझरती नजर टाकली तरी त्यात आशेपेक्षा निरेशाची शेवाळच जास्त माजलेली. मनुष्याने सुखाकरिता, शांतीकरिता, समृद्धीकरिता धडपडत रहावे आणि या तीनही स्थिती निराशेच्या शेवाळीखाली गुपचूप दडूनच रहाव्या, असला विचित्र अनुभव नसणारा माणूस म्हणजे प्रदर्शनासाठी पेंढा भरून ठेवण्यालायक चीजच समजली पाहिजे. व्यवसाय कसलाही असो, त्यात निराशेची ढगारे तेलंगी भिक्षुकांप्रमाणे न बोलवता आपण होऊन मागणीच्या दसपट पुरवठ्याने दत्त म्हणून नेहमीच उभी असतात. अशा प्रसंगी शिरोभागी दिलेल्या चित्राप्रमाणे चैतन्य देवता एकाकी आपल्याजवळ येऊन उभी रहावी, तिने गोड उत्तेजक वाणीने `गड्या उमेदवार तरुणा!’ अशी हाक मारून, आशेच्या किरणांचा मूळ साठाच आपल्याला बिनचूक दाखवून द्यावा आणि गलितधैर्य बनलेल्या आपल्या हृदयात उत्साहाचा फुंकर घालून त्याला तात्काळ हिंमतवान् बनवावे, असला योगायोग कधीकाळी कोणाला लाभलाच तर त्याची गोडी अमृताला लाजवील, स्वर्गाला खिजवील, कामधेनूला थिजवील आणि कल्पवृक्षाला आपल्या संपन्नतेने नखशिखान्त भिजवील. आशेचा एक किरण, उपदेशाचा अनुभवसिद्ध एक वळसा आणि कर्तव्यबुद्धीला जागृत करणा-या प्रबोधनशक्तीचा एकच फुंकर, या तीन गोष्टींचा अभाव महत्त्वाकांक्षी तरुणांच्या सा-या हिमतीला असून नसून सारखी करतो. नुसते आत्म्याचे अस्तित्व एकटे काही करू शकत नाही. त्याला पंचतत्त्वांच्या देहाचे आवरण द्या की तात्काळ तो नर किंवा नारीपणाने नारायणपदाचा आक्रम करण्यास सिद्ध होतो. तद्वतच नुसत्या महत्त्वाकांक्षेची वाफ कितीही भरपूर असली तरी वरील तीन तत्त्वांचे कवच जर तिला लाभले नाही, तर ती वाफ वारेमाफ खर्च होऊन फुकटच जाईल. तरुण तरुणींच्या महत्त्वाकांक्षांची वाफ अशा रीतीने फुकट जाऊ देणे हे राष्ट्रहितदृष्ट्याही फार घातक आहे, हे विचारवंतांस सांगणे नलगे.
विचारांची उत्क्रांती होण्यासाठी श्रवण मनन निदिध्यास असा त्रिदळी मंत्र आमच्या आर्यपूर्वजांनी आम्हास वंशपरंपरा बहाल केलेला आहे. पैकी उपनयनोत्तर गुरूसंनिध शिक्षणाची पद्धत हद्दपार झाल्यामुळे श्रवणाची जागा वाचनाने पटकविली आहे आणि गुरुजनांनाही मुमुक्षु छात्रांसाठी ग्रंथद्वारा आपल्य जिव्हा हजारो मैलांपर्यंत लांबविणे भाग पडले आहे. सध्या गुरूंची जागा ग्रंथांनी पटकविली आहे आणि विचारक्रांतीच्या मंदिराच्या पाय-यांचा अनुक्रम (१) वाचन (२) मनन आणि (३) निदिध्यास असा लागलेला आहे. अर्थात् ग्रंथकर्तृत्वाचे सामर्थ्य हाती असणारांवर केवढी जबाबदारी असते आणि निराळेच्या जंगलांत वाट चुकलेल्या उमेदवार तरुणांना त्यांच्यापासून कोणत्या प्रकाशाची अपेक्षा असते, हे वाचकांनी ताडलेच असेल. शेजा-यापाज-याच्या आप्तेष्टांच्या किंवा सनदी उपदेशकांच्या अनुशासनावर सर्वस्वी विसंबून न रहातां, केवळ स्वावलंबनाच्या जोरावर आत्मोद्धार करू इच्छिणा-या तरुणांना उत्तेजक वाङ्मयाची फार तीक्ष्ण जाणीव भासत असते. कर्तव्याची पावले अशी टाकू की तशी टाकू, निराशेच्या गर्द धुक्यात निष्कारण कोणाशी टक्कर लागू नये म्हणून माझ्या हिमतीचा हापटबार येथेच वाजवू की पुढे कोठे तरी वाजवू आणि मी तुडवीत हे ती पाऊलवाट संतमहंताची आहे की चोरलुटारूंची आहे, अशी संशय-कंटक-माला हरदिन हरघडी त्याच्यापुढे गुहेत दडलेल्या वाघाप्रमाणे गुर्र गुर्र करून भेडसावीत असते. अशा वेळी प्रत्येक स्वावलंबी तरुण उत्तेजक वाङ्मयासाठी तान्हेलेला असतो व त्याच्या प्रगतीच्या मार्गावर उत्तेजनाचे व उत्साहाचे एकच किरण फेकणारा चार ओळींचा चिटोरा जरी त्याला हस्तगत झाला तरी त्याची महति त्याला चतुर्वेदांपेक्षा अधिक वाटते. फार काय पण जी सूत्रे आपण नेहमी वाचतो व भाषणप्रसंगी सहजगत्य. बोलून जातो, अशा एकेका सूत्राच्या निव्वळ मनन-निदिध्यासाने शळेकडो नर नारायण बनल्याची उदाहरणे पाहू इच्छिणारांनी `नोटेबल्स ऑफ ग्रेट ब्रिटन’ हा सचित्र ग्रंथ आढळल्यास पहावा.
आपल्याकडे उत्तेजक सूत्रांचा जरी तुटवडा नसला तरी तीच सूत्रे चटकदार पेहरावात सुटसुटीत आख्यानांच्या द्वारे मांडणा-या स्फूर्तिदायक वाङ्मयाचा यत्न मात्र मुळी कोणी केलेला दिसत नाही. यावर आक्षेपक रामायण, महाभारताकडे बोट दाखवितील; पण त्यांना आम्ही एवढेच सांगू की बुडणारा माणूस `पोहण्याची कला’ या उपयुक्त पुस्तकाच्या दर्शनाने किंवा स्मरणाने वाचत नाही. त्याला तात्कालिक सक्रीय मदतीची अपेक्षा असते. निराशेच्या जंगलांत वाट चुकून हतबुद्ध झालेल्या तरुणाला तात्कालिक उत्तेजनाची आवश्यकता असते. रामायण, महाभारताची पारायणे करण्याची मुळीच नसते. त्यातून या दोन ग्रंथांवर दैवीपणाच्या शेंदराची पुटे दाट चढविल्यामुळे प्रत्यक्ष संसारांत वावरणारा इसम तात्कालिक स्फूर्तीच्या कणासाठी या ग्रंथांच्या असंख्य दालनांतून भटक्या मारण्यास केव्हाही संकोचच बाळगणार. हे ग्रंथ सहसा प्रत्येक ब-यावाईट स्थितीच्या माणसाला स्वाध्यायार्थ सुलभ नसतात; आणि ज्या प्रकारच्या वाङ्मयाबद्दल आमचा विशेष कटाक्ष आहे, ते वाङ्मय रामायण किंवा महाभारतात मुळीच नाही. तानाजी पडल्यानंतरचा शेलारमामाचा आवेश निराशामग्न तरुणाला कार्यक्षम बनविण्यास जितका उपयोगी पडतो, तितका रामायणातला तसलाच एखादा प्रसंग मुळीच पडत नाही.
आमच्याकडे निर्माण होणारे कोणतेही वाङ्मय घ्या, त्यात स्माईल्सने लिहिलेल्या ड्यूटी, थ्रिफ्ट इ. प्रकारचे वाङ्मय मुळीच दिसत नाही. बरे, ज्यांनी असल्या काही ग्रंथांची भाषांतरे केली, त्यांना ती मुळीच साधली नाहीत. सारी येथून तेथून निर्जीव पोचट व रूक्ष! उदाहरणार्थ दाभोळकर सीरीजचे ग्रंथ पहा. स्वावलंबी तरुणांना असले वाङ्मय पाहिजे की त्यातली एखादीच णथळ्याची ओळ वाचताच त्यांच्या गूढ व सुप्त कर्तबगारीने टाणकन् उसाळी मारली पाहिजे. हे वाङ्मय भीक मागणा-या साक्षर भिका-यापासून किंवा मजुरदारांपासून तो उपलब्ध सर्व पदव्या पटकावून बसलेल्या बृहस्पतीपर्यंत सर्वांना सबसारखे स्फूर्तिप्रेरक व योग्य मार्गदर्शक असले पाहिजे. याला `उत्तेजक वाङ्मय’ हे नाव असले तरी त्याच्या उत्तेजनाचा परिणाम माथेफिरूपणा निर्माण करण्यात होत नसतो. हल्ली कित्येक वर्तमानपत्रात व मासिकात `उत्तेजक’ म्हणून जे वाङ्मय प्रसिद्ध होत असते, ते विचारापेक्षा विकारांना खळबळविण्याचेच कार्य करिते व त्यापासून तरुणजनात कर्तबागारीची खरी प्रेरणा उत्पन्न न होता भरमसाट माथेफिरूपणाच जास्त वाढतो. अर्थात या वाङ्मयाला `उत्तेजक वाङ्मय’ न म्हणता माथेफिरु वाङ्मय असेच म्हटले पाहिजे. विकार कितीही क्षुब्ध झाले तरी त्यांच्या उसळीची लाट तात्पुरती असते; पण तेच विचार जर पद्धतशीर मार्गाने परिणत होत गेले तर मनुष्याच्या जीवनात विलक्षण क्रांती घडून, त्याच्या कर्तबगारीचे रंग एकामागून एक उमलू लागतात. आजपर्यंत प्रसिद्धीस आलेले कर्तबगार लोक विकारी वाङ्मयापेक्षा विचारी वाङ्मयानेच जगाला दिलेले आहेत. अशा प्रकारचे वाङ्मय इंग्लंडमध्ये प्रथमतःच सुरू करण्याचे पुणकार्य पीटर कीरी नामक गृहस्थाने केले व आमच्या महाराष्ट्रात ते `किर्लोस्कर खबर’च्या द्वारे किर्लोस्कर शंकरराव यांनी केले आहे. पीटर कीरी हे स्वावलंबनाने अत्यंत हीनावस्थेतून उन्नतावस्थेत गेलेले कर्मवीर होते. ते हमाली करता करता इंग्लंडचे जस्टिस ऑफ पीस झाले. त्यांनी आपल्या कर्मयोगाचा गुरुमंत्र (१) Secret of Success (२) Get on or Get out (३) Sucees after Failure आणि (४) Do it now या चार सुबोध ग्रंथांत नमूद करून ठेवलेला हे. हे चार मथळेच इतके मार्गदर्शक आहेत की पुस्तक न वाचताही हतबुद्ध तरुणाला कार्यक्षम व उत्साही बनविण्यास समर्थ आहेत. आत्मनिरुपणाबद्दल वाचकांची क्षणा मागून एवढेच सांगतो की पीटर कीरीच्या `गेट ऑन् ऑर गेट आऊट’ या पुस्तकाच्या नुसत्या दर्शनाने प्रस्तुत लेखकाच्या चारित्र्यात एका भयंकर प्रसंगी विलक्षण क्रांती घडून आली. तो प्रसंग असा होता की धरले तर चावते व सोडले तर पाठी लागते. अशा वेळी Get on or Get out ही सूचना किती सहाय्यक झाली असेल याची वाचकांनीच कल्पना करावी. पीटर कीरीच्या ग्रंथांनी लक्षावधी बहकलेले तरुण उन्नतीच्या मार्गाला लागल्याची साक्ष खुद्द लंडन टाईम्सने दिली आहे. आम्ही स्वानुभवाने आमच्या सर्व वाचकांना सांगतो की काय वाटेल ते करून – तुम्हाला इंग्रजी भाषा येत असेल तर – पीटर कीरीचे वरील ग्रंथ वाचल्याशिवाय मुळीच राहू नका. तुमच्या जीवनावर दैवी प्रकाश पडेल. निराशेने खचलेली तुमची छाती तट्ट फुगून फुरफुरू लागेल. `माथेफिरू’ वाङ्मयाची तुम्हाला बाधा होणार नाही आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्या कर्तबगारीचे योग्य प्रमाणात अनिर्वनीय प्रबोधन होईल. ही कामधेनु ताईताची जाहिरात नव्हे, हा कळकळीचा प्रेमळ संदेश आहे.
[प्रबोधन, १-७-२२]
लेख १६
चिरंजीव कोण?
स्थावरजंगम जगताला निश्चयाने बिनमुर्वत गिळून फस्त करणा-या काळाला सर्वभक्षक म्हणतात, ते अक्षरशः खरे आहे. अनंत मन्वंतरांची चटणी तोंडी लावून शेकडो युगानुयुगांना आपल्या विश्वव्यापी उदरांत रिचविणा-या काळापुढे कोणत्याही सत्तेची मात्र लवमात्र चालत नाही; म्हणूनच `कालाय तस्मै नमः’ असा एकजात सर्व तत्त्ववेत्त्यांनी काळास प्रणिपात ठोकलेला आहे. काळाचा जबडा असा सर्वव्यापी आहे, तशी त्याची जिव्हा व दाढा या बेगुमान आहेत. त्यांना कोणत्याही गोष्टीच्या प्रचंडत्वाची किंवा क्षुद्रत्वाची मुळीच क्षिती वाटत नाही किंवा रुची अरुचीची पर्वा भासत नाही. मोठमोठी विस्तृत साम्राज्ये घशाखाली लोटताना काय, किंवा एखाद्या अज्ञात खेड्याचे उच्चाटन करताना काय; एखादा जगज्जेता शिकंदर किंवा अशोक दाढेखाली काडकन् फोडताना काय, किंवा मातीमोल लांबलचक आयुष्याला कंटाळून निर्जन वनात मरणा-या भणंग भिका-याला झटपट गिळताना काय; मर्यादित बुद्धिमत्तेच्या जोरावर सृष्टीतील गूढ आद्यतत्त्वांचा शोध लावून सृष्टिविधात्या परमेश्वरावर बेछुट मात करणा-या ज्ञानेश्वराला बोल बोलता अल्पवयात कोवळ्या काकडीप्रमाणे गट्ट करताना काय, किंवा `देवा, माझे डोळे मिटव रे लवकर’ अशी रात्रंदिवस याचना करीत अज्ञान व दारिद्र्यात खितपत पडलेल्या शतायुषी प्राण्यावर `देवाज्ञे’चा उपकार करताना काय; काळाला योग्यायोग्यतेची किंवा ब-यावाईटाची चाडच नसते. काळाची झापसुद्धा इतकी जबरदस्त की हजारो वर्षे वैभवपूर्ण साम्राज्यसत्ता गाजविलेल्या जगद्व्यापी राष्ट्रांची स्मृतिसुद्धा त्याने आज अक्षरशः नामशेष केलेली आहे. केवढे ते प्रचंड रोमन साम्राज्य, किती विशाळ ती ग्रीक संस्कृति, चंद्रगुप्त मौर्य सम्राटाचा केवढा तो दरारा, अशोकाच्या धर्मसंवर्धनाची कसली ती त्रिखंडव्यापी मिशनरी चळवळ, माधवारण्यांची स्थापन केलेल्या विजयनगरचा काय तो त्रिभुवन निनादित बोलबाला, मुष्क हिन्याच्या अत्तराप्रमाणे साऱ्या युरोप आशियाभर दणाणणारी दिल्लीच्या मोंगल बादशाहीची केवढी ती ऐश्वर्याची लकाकी; पण आजला त्यांच्या नाममात्र स्मृतीशिवाय विशेष काय उरले आहे बरे? सिनेमाच्या चित्रपटाप्रमाणे या दृष्य सृष्टीत हे निरनिराळे चित्राकर्षक देखावे निर्माण करण्याची ज्या काळाला लहर आली, त्या काळाच्या उदरसागरातच त्या देखाव्यांच्या लहरी अखेर विलीन झाल्या!
काळाचा दात कितीही तीक्ष्ण असला आणि त्याचा दंश कितीही स्मृतिविध्वंसक असला तरी त्याच्या तीक्ष्ण दंशाला दाद न देता त्याच्या नांगीला बोथट करण्यात महशूर असे एकतत्त्व या मर्त्यलोकात आहेच आहे. मर्त्य मानवांना अमर करण्यात, त्यांना चिरंजीव बनविण्यात, याच तत्वाने प्रत्यक्ष काळाशी त्रिकालाबाधित झगडा चालवून त्यावर आपल्या पराक्रमाचा बिनतोड शह ठेवून दिला आहे. या तत्त्वाने मृत्युलोकांच्या इतिहासाला जिवंत ठेविले आहे. काळाच्या अक्राळविक्राळ दाढा या तत्त्वाचे पीठ करण्यास धजावताच खुद्द त्याचे पीठ पडण्याचा प्रसंग काळाच्या पूर्ण अनुभवाचा असल्यामुळे, या तत्त्वाच्या वाटेस सहसा जाण्याच्या भानगडीत तो पडत नाही. मृत्युलोकीच्या अनंत कटुतम आधीव्याधींच्या जहरातसुद्धा अखेर अमृताचा स्वाद निर्माण करणारा मसाला याच तत्त्वाचा असतो. मानवी सत्ताधा-यांच्या जुलमी अत्याचारांस बळी पडलेल्या देवभक्तांच्या किंवा देशभक्तांच्या रक्ताच्या थेंबागणिक अनंत देवभक्त व देशभक्त निर्माण करणारे तत्त्व ते हेच. या तत्त्वाच्या उपासकांचे देह जरी सृष्टिक्रमानुसार नष्ट होतात, तरी त्यांच्या तत्त्वोपासनेचा अग्नि विझविण्याचे कार्य खुद्द सर्वविध्वंसक काळालाही आजपर्यंत शक्य झाले नाही. हा अग्नि विझत तर नाहीच, पण धावत्या काळाच्या सोसाट्याने उलट अधिकाधिक चेतविला मात्र जातो. असे हे अजिंक्य तत्त्व तरी कोणते? आणि या तत्त्वाचे उपासक ते कोण? या मर्त्य जगातले अमर्त्य तत्त्व म्हटले म्हणजे सत्य हे होय आणि या तत्त्वाच्या उपासकांना सत्यशोधक असे म्हणतात. सत्य सर्वव्यापी आहे. मानवजातीच्या उत्क्रांतीला सहायभूत अशा सर्व क्षेत्रांचा इतिहास सत्यशोधकांनी आपल्या निष्काम कर्तव्यानेच आजपर्यंत रंगवून, आपण चिरंजीव आहोत असे खुद्द सर्वभक्षक काळाच्या तोंडून वदवून घेतले. सत्यशोधकांचा इतिहास अत्यंत विस्तृत आहे. किंबहुना असेच म्हणणे अधिक श्रेयस्कर होईल की जगाच्या प्रगतीचा इतिहास हाच सत्यशोधकांचा इतिहास होय. विद्वज्जनांनी देवाला अनेकवचनी नटविला तरी तो एकवचनी `एकच देव’ आहे, हे सत्यशोधन उपनिषत् ग्रंथद्वारे जाहीर करणा-या जनकादि सत्यशोधकांपासून तो विद्यमान सत्याग्रही महात्मा गांधीजीपर्यंत ही सत्यशोधकांची ऐतिहासिक परंपरा अखंड चालूच आहे.
मूलतः सत्य तत्त्वच बिनमुर्वत असल्यामुळे त्याच्या उपासकांच्या चारित्र्यांत आग्रहीपणाची ताठर प्रवृत्ती विशेष आढळल्यास काही नवल नाही. या आग्रही प्रवृत्तीमुळे सर्व सत्यशोधकांचा, सामान्य जनतेच्या अंधश्रद्धेच्या जोरावर, सत्ताधा-यांकडून अनन्वित छळ, उपहास व कित्येक वेळा प्राणहानीही झाल्याचे इतिहासात नमूद आहे. सत्यशोधकांचा सत्याचा संदेश त्यांच्या समकालीन जनतेला सर्वस्वी रुचल्याचे व पचल्याचे उदारहण दुर्मीळ आहे. आमच्या प्राचीन इतिहासावर पुराणांचा कचरा सांवडल्यामुळे त्याच्या ख-या स्वरूपाचा थांग लागणे जरी दुरापास्त झाले आहे, तरी युरपमध्ये सत्यशोधकांच्या छळाचा इतिहास अजून स्वच्छ राहिलेला आहे. तिकडील जनतेने सत्यशोधक येशूला क्रॉसवर टांगून ठार मारले. ब्रूनोला भर चव्हाट्यावर उभा जाळला. कोणाचे डोळे काढले, कोणाचेकडेलोट केले, कोणाला उपासमारीने मारले, वगैरे अगणित अमानुष अत्याचार केले. निरनिराळ्या क्षेत्रांतील सत्यशोधकांची अशा रीतीने प्राणहत्या झाली, तरी त्यांच्या सत्यतत्त्वाची हानी मुळीच न होता, वा-याच्या सोसाट्याने विस्तवाची क्षुल्लक ठिणगी जशी बोलबोलता भयंकर प्रळयाग्नीत रूपांतर पावते, तशी त्यांच्या मिशनची तीव्रता त्यांच्या प्राणहानीने किंवा उपहासाने दिवसेंदिवस अधिकाधिक तिखट होत जाते. सत्यशोधकाचा बाणा सतीच्या वाणाप्रमाणे आहे. सत्याची कसोटी म्हणजे सत्यशोधकाच्या जीवाचे दिव्य होय. त्याला सत्यापुढे प्राणाची तमा लवमात्र नसते. लोकमान्यतेची त्याला पर्वा नसते. त्याच्या बाजारात निंदास्तुतीची किंमत एकच ठरते. त्याची दृष्टी उच्च सत्याच्या केंद्रावर खिळलेली असल्यामुळे, पायाखाली वावरणा-या `खालमुंड्या मुलुखधुंड्या’ जनतेच्या लौकिकी आचार विचारांच्या धसळामुसळीकडे सत्यशोधकाचे लक्षच रहात नाही; किंवा आपल्या सत्याग्रहामुळे एखाद्या सत्ताधा-याच्या नाकाडावर आपला पाय पडत आहे, एकाद्या धर्ममार्तडांच्या छाताडावर आपल्या सत्यशोधनाची धोंड पडून त्याचा जीव कासावीस होत आहे, किंवा आगापीछा न पहाता निवळ हुल्लड करण्यातच जीवितसाफल्य मानणा-या अंधश्रद्धाळू जनतेच्या झुकत्या लहरीवर स्पष्टोक्तीचा पाय तिरपा पडल्यामुळे त्यात आपला पूर्ण कपाळमोक्ष होणार आहे, याची क्षिती सत्यशोधक महात्म्यांस मुलीच नसते. देह जावो अथवा राहो पांडुरंगी माझा भावो. पांडुरग सत्याचा असतो. त्या सत्यासाठी जीवितसर्वस्वावर पाणी सोडणारा सत्यशोधक चिरंजीव का म्हणू नये?
[प्रबोधन १६-३-२२]
लेख १७
शिवराया प्रणित कराया ब्रिटानिया आली
सृष्टीच्या जन्मापासून तिने अनंत वेळा अरुणोदयाचा मंगल सोहळआ आपल्या डोळ्यांनी पाहिला. ज्या एकजनिसी प्रेमसूत्रात परमेश्वराने सारी स्थावर जंगम दुनिया निगडित केलेली आहे, त्या प्रेमसूत्राशी आपल्या निष्कलंक मृदुल हृदयाची तार एकतान करून, अनेक महाकवींनी आपल्या ओजस्वी प्रेमोद्गारांचे अर्घ्य अरुणोदयकाळी स्वयंप्रकाशी तेजोनिधीला अर्पण करून, खुलत्या मनोवृत्तीला चालत्या बोलत्या काव्यात प्रतिबिंबित केले. मानवी अंतःकरण हे जात्याच काव्यमय असते. असा कोट्यवधि अंतःकरणांच्या काव्यप्रवृत्तीला स्फूर्तीचे सहाय नसल्यामुळे त्यांना अरुणोदयाचा सोहळा जरी दृश्य शब्दचित्रांत व्यक्त करवला नाही, तरी सौंदर्यबहराने प्रफुल्लित झालेल्या मुग्ध तरुणींच्या मुग्ध भावनांप्रमाणे त्यांनी आपल्या हृदयांना डोळ्यांत केंद्रीभूत करून आनंदाश्रूच्या एकच टिपक्याने अरुणाचे स्वागत केले. अरुणोदयाचा हा मंगल सोहळा सृष्टीच्या अंतापर्यंत असाच चालणार. दिवसामागून रात्र आणि रात्रीमागून दिवस, या सनातन क्रमानुसार राष्ट्राच्या चरित्रात स्वातंत्र्यामागून गुलामगिरी व गुलामगिरीच्या पाठोपाठच स्वातंत्र्य, हा भरतीओहोटीचा क्रम अखंड चालू असलेला स्पष्ट दिसतो. ज्या अरुणाने एक दिवस हिंदूंच्या विजयनगर साम्राज्याची धडाडलेली होळी पाहिली, त्याच अरुणाला पुढे एक दिवस त्याच हिंदुसाम्राज्याचा जरीपटका उजळ माथ्याने रायगडावर फडपडताना पाहून त्याला अदबीने मुजरा करावा लागला. हिंदु धर्माच्या ज्वलज्जहाल अभिमानाच्या पायी शरीरावयवांचे राईराईएवढे तुकडे होऊन, रट रट उकळणा-या क्षत्रिय रक्ताच्या पुरात अस्ताव्यस्त पडलेले शंभूछत्रपतींचे प्रेत ज्या अरुणाने आरक्त डोळ्यांनी पाहिले, त्याच अरुणाला मानी मराठ्यांच्या राजकारणी कर्तबगारीचे व दिल्लीपतीच्या पहारेबंद अंतःपुरात घुसून स्वप्नसृष्टीत सुद्धा त्याच्या काळजाचे पाणीपाणी करणा-या भाल्याच्या तिखट पात्याच्या पराक्रमाचे इंद्रतुल्य प्रदर्शन जिंजीच्या किल्ल्यावर एकवटलेले दिसले. कडव्या इस्लाम सत्तेच्या धांगडधिंग्याला छातीठोक पायबंद चढवून रायगडची राजलक्ष्मी सातारच्या अजिंक्यता-यावर स्थापन करणा-या शाहुछत्रपतीचा राज्यारोहणसोहळा पाहून ज्या अरुणाने छत्रपतीच्या सत्तासूर्याला पेशवाईचे खग्रास ग्रहण लागलेले पाहन, सारी दुनिया दुःखाश्रूंच्या मुसळधार वर्षावाने धायधाय रडत बसलेली पहाण्याचा कुप्रसंग आला. हिंदुपदपातशाहीच्या पुनरुज्जीवनाच्या ज्या अव्यक्त परंतु प्रत्यक्ष भासमान चैतन्याने प्रचंड सह्याद्रीचे उंचउंच कडे व दरीखोरी गदगदा हालवून, मावळच्या रखरखीत धुळीच्या कणाकणातून काळाचे काळ असे कर्दनकाळ मावळे निर्माण केले; ज्या चैतन्याच्या हिमतीवर तानाजीने सिंहगडाच्या नरडीचा घोट घेतला; ज्या चैतन्याच्या वावटळीत सुरतपाक सुरतेचा नखरा उतरून सारा गुजराथ प्रांत महाराष्ट्राचा दर्यालगत देवडीवरचा हुज-या बनला; ज्या चैतन्याने राष्ट्रांतल्या व्यक्तिमात्राला गुणकर्माच्या पुण्यांशानुसार उदयास आणून, जन्मसिद्ध श्रेष्ठकनिष्ठ भावनेचा गागाभट्टासमक्ष मुरदा पाडला व जातिभेद-राक्षसाच्या रक्ताचा टिळा श्रीशिवछत्रपतीच्या कपाळी रेखून हिंदुपदपातशाहीच्या पुनरुज्जीवनाचा संदेश जाहीर करणा-या तोफांच्या सरबत्तीचा दणदणाट जगाच्या कोनाकोप-यात नेऊन भिडविला; त्याच तेजःपुंज उदार क्षात्र चैतन्याला पेशव्याच्या संकुचित व स्वार्थी अशा ब्राह्मणी संस्कृतीचे खग्रास ग्रहण लागताच, हिंदुंच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचे कपाळ पानपतास फुटले. इतर अनेक गुणकर्मजन्य राष्ट्रशक्तीचा समूळ उच्छेद करून, शुद्ध भिक्षुकी वर्चस्वाची एकमुखी सत्ता राष्ट्राच्या बोकांडी बसली असता त्या राष्ट्राच्या सर्व संस्कृतीचा अल्पावकाशात निःपात कसा होतो, याची ठळक ठळक उदाहरणे जगातल्या मुख्यमुख्य राष्ट्रांच्या इतिहासात कितीही असली, तरी भिक्षुकी सत्तेच्या एकमुखी वर्चस्वाने झालेले पानपताच्या अधःपाताइतके चिळस आणणारे उदाहरण पूर्वी कधी झाले नाही व पुढे कधीही न होवो! पेशव्यांच्या भिक्षुकी सत्तेने महाराष्ट्राच्या शिवशाहीला पानपतास तोफेच्या तोंडी देऊन तिच्या राईराई एवढ्या ठिक-या ठिक-या केल्यानंतर, महाराष्ट्राच्या राजकीय, धार्मिक व सामाजिक जीवनात अनेक भिक्षुकी उत्सवमूर्तींनी आपल्या गुणकर्मसिद्ध अत्याचारी प्रवृत्तीची रग जिरवून घेतली. या अत्याचारांचा इतिहास इतका अलीकडचा आहे, व त्याची परंपरा चालविणारे इतके अभिमानी सांप्रदायिक आज घटकेला सुद्धा आमच्या उघड्या डोळ्यांसमोर बेशिस्त नाचत आहेत की हा दुष्ट ऐतिहासिक चित्रपटच स्मृतिआड करू म्हटले तरी होत नाही.
श्रीशाहुछत्रपतीच्या छत्राखाली एकवटलेल्या म-हाटेशाहीच्या वैभवकाळापासून तो पापस्मरण चिंतामणी सांगलीकर, बाळा नातू प्रभृति नरपशूंनी छत्रपति प्रतापसिंहाची व त्याच्या बरोबरच शिव छत्रपतीच्या छत्रचामरसिंहासनाची होळी करीपर्यंतच्या बीभत्स भेसूर व मनोवृत्ती प्रक्षुब्ध करणा-या लांबलचक ऐतिहासिक चित्रपटाचे निरनिराळे देखावे ज्या अरुणाने पाहिले, त्याच अरुणाला येत्या १९ नोव्हेंबरच्या दिवशी
शिवराया प्रणिपात कराया ब्रिटानिया आली
हा नवयुगातला कल्पनातीत मंगल सोहळा पाहण्याचा कपिलाषष्ठीचा योग लाभणार आहे. हा योग अरुणाला लाभू नये; या योगाचे प्रदर्शन निमकहराम पेशव्यांच्या पुण्यातील शनिवार वाड्याच्या छाताडावर भरले जाऊ नये; ज्या कृतघ्न नोकरांनी आपल्या धन्याचा विश्वासघात करून हिंदुपदपातशाहीचा खून केला, त्यांच्या वाड्याच्या नाकासमोर, गेल्या महायुद्धात धारातीर्थी पतन पावलेल्या मराठे वीरांचे स्मारक व श्रीशिव छत्रपतीचा भव्य स्मारक पुतळा उभारण्यासाठी कृतज्ञ बुद्धीने येणा-या ब्रिटानियेच्या प्रतिनिधाला या सोहळ्याचे पुम्य लाभू नये, म्हणून या स्मारकामुळे भिक्षुकशाहीवर बहुजनसमाजरूपी लोकशाहीची होणारी मात गर्भातल्या गर्भात मारण्याची चळवळ नाना फडणीसांच्या सांप्रदायिकांनी सुरू केली आहे. प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हातून होणा-या या स्मारकाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे भिक्षुकशाही सांप्रदायिकांनी भोळ्याभाबड्या अज्ञ जनतेवर पांघरून ठेविलेल्या मोहजालप्रतिष्ठेचा प्राण जाणार आहे. जे काम शेकडो उलटसुलट कवट्यांच्या इतिहासकारांच्या हातून घडले नाही, ते काम प्रिन्स ऑफ वेल्सच्या हातून आज काळच घडवून आणीत आहे. खरे म्हटले तर हा प्रसंगच असा आहे की महायोगात महाराष्ट्रातल्या सर्व भेदांनी मज्जन स्नान करून अभेद व्हावे. सर्व पंथांनी या प्रयागात द्वैताला मूठमाती देऊन अद्वैत व्हावे. ब्राह्मण ब्राह्मणेतरांनी श्रीशिवरायाची शपथ घेऊन खुल्या दिलाने महाराष्ट्रीय म्हणून राष्ट्रसेवेसाठी एकमेकात समरस व्हावे. ब्राह्मणांनी निरच्छ भावनेने क्षत्रियांना `या बसा’ म्हणावे. क्षत्रियांनी त्यांना वंदन करून त्यांचा मान राखावा. दोघांनी मिळून वैश्यजनांचा सत्कार करावा आणि सर्वत्रांनी शूद्र अस्पृश्य बांधवांची जाहीर क्षमा मागून कृत पातकांना पश्चात्तापित आनंदाश्रूंच्या धबधब्याखाली पार बुडवून टाकावे. अशी ही अमृतसिद्धीची पर्वणी वारंवार येत नसते. या पर्वणीला लाथाडण्याइतका अमृतद्वेष्ट्या राष्ट्रद्रोह्यांचा मुर्दाडपणा जरी उतास जात असला, तरी ख-या राष्ट्रहितेच्छूंनी या मुर्दाडांचा कान वेळीच पिळण्याची खबरदारी घेणे अवश्य आहे. आम्ही करू तेच राष्ट्रकार्य, बोलू तीच राष्ट्रवाणी आणि सांगू तोच राष्ट्रोद्धारक मंत्र, अशा धाटणीच्या चळवळी म्हणजे लोकशाहीच्या तत्त्वाची नागजी उघडी विटंबना होय. या अनिष्ट परंपरेचा अभिमान जोपर्यंत हरघडी डोके वर काढीत आहे तोपर्यंत महाराष्ट्राला भागद्याचे दिवस लाभणे शक्य दिसत नाही. आजला जे असंख्य भेद व पंथ महाराष्ट्रात एकमेकांच्या उरावर बसून त्याच्या ख-याखु-या राष्ट्रीय जीवनाचे धिंडवडे काढीत आहेत, त्या सर्वांना या उर्मट परंपरेचेच खत पडत आहे. महाराष्ट्राच्या वैभवाची चाड असणा-या सर्व भगिनी बांधवांनी, अतःपर आत्मवंचन न करिता, या स्वराज्यद्रोही पेशवाई पेशवाई परंपरेचा काटा उचकून झुगारण्याचे नैतिक धैर्य अवस्य दाखविले पाहिजे.
श्रीशिवाजी महाराज नवमतवादी नवयुगाचे सूत्रधार, मृत झालेल्या राष्ट्राला जिवंत करमारे धन्वंतरी आणि आत्मतेजाने दगडधोंड्यांनासुद्धा चैतन्याचे कल्पतरू बनविणारे जादुगार होऊन गेले. अर्थात् त्यांच्या नवमतवादी पराक्रमाच्या बरोबरच त्यांच्या चारित्र्याचा विपर्यास करणारा जीर्णमतवाद हातात काजळीचे काळे मडके घेऊन लपत छपत त्यांच्या मागोमाग पाठलाग करीतच होता. हेतूंचा विपर्यास, कर्तबागारीची बीभत्स हेटाळणी व वृद्धिंगत होणा-या वैभवाची निंदा, या गोष्टी नवमतवाद्यांची प्रियकर लेणी होत. शिवाजी महाराजांवर या लेण्यांचा वर्षाव करण्याच्या कामी मुसलमान व इंग्रज बखरकरांच्या जोडीनेच महाराष्ट्रातल्या जीर्णमतवाद्यांनी आपल्या मत्सरी बुद्धीला असूयेच्या सताड मैदानावर बेफाम नाचविण्यास मुळीच कमी केले नाही.
खाफीखानाने शिवाजीच्या चरित्राचा `काफीर शैतान नरकात गेला’ या शे-याने समाचार घेतला, इंग्रज बखरकारांनी त्याला `डोंगरातला उंदीर, खुनशी व विश्वासघातकी’ ठरविले, मोक्षदात्या भिक्षुकशाहीने त्याला `शूद्र’ वर्गात ढकलून दिले आणि जे मराठे बांधव आज श्रीशिवभक्तीने उचंबळून जाऊन त्याच्या स्मारकाचा पाय ब्रिटिश शहाजाद्याच्या हातून परवा बसविणार, त्यांच्या समशेरबहाद्दर वाडवडिलांनी राज्यारोहणाच्या आदल्या दिवसापर्यंत शिवाजीच्या वाढत्या वैभवाला आपली संमतिसुद्धा दिली नाही. या सर्वगोष्टींची आठवण झाली म्हणजे स्वकीय परकीयांच्या विरोधांना बिलकुल न जुमानता, केवळ आत्मसामर्थ्याच्या जोरावर सह्याद्रीच्या धुरोळ्यांतून हिंदुपदपातशाहीची टोलेजंग सृष्टि निर्माण करणा-या आद्यछत्रपतीच्या चारित्र्याचे कौतुक करावे तितके थोडेच असे वाटल्याशिवाय राहणार नाही.
शिवाजीच्या चरित्राचा व चारित्र्याचा आजपर्यंत जितका गर्हणीय विपर्यास व मानखंडना झालेली आहे, तितका विपर्यास व मानखंडना जगातील कोणत्याही स्वराज्यसंस्थापकाची झालेली नाही. इंग्लंड राष्ट्र हे स्वतःस स्वातंत्र्याचे भोक्ते म्हणविते. पृथ्वीतलावर स्वातंत्र्य भोगणारे व इतरांना स्वातंत्र्य देणारे हरीचे लाल काय ते आम्हीच, अशी यांची गर्वोक्ति ऐकून ऐकून आमचे कान अगदी किटून गेले आहेत. ब्रिटन लोक कधीही गुलाम होणार नाहीत, अशी या ब्रिटिश केसरीची गुरकावणी इंग्रजी प्रायमराच्या चोपड्यापासून तो पार्लमेंटातील ब्ल्यू बुकापर्यंत सर्व लहानथोर ग्रंथातून आजपर्यंत मनमुराद ऐकू येत असते. परंतु स्वातंत्र्याच्या लंबाचवड्या वल्गना करणा-या ब्रिटिश केसरीचा गेल्या दोनशे वर्षांतला स्वातंत्र्य-संसार इतिहासाच्या दुर्बिणीतून पाहिला, तर पारतंत्र्यांतून कर्तबगारीच्या व आत्मसामर्थ्याच्या जोरावर स्वातंत्र्य मिळविणा-या प्रत्येक मर्द वीराची त्याने आपल्या तीक्ष्ण नखाच्या पंजाचे फटकारे मारमारून अत्यंत निर्दयपणाने विटंबना केल्याचे दाखले त्या संसाराच्या चवाट्यावर अनेक दिसतात. ज्या जोन ऑफ आर्कच्या पुतळ्यासमोर `ला मार्सेलीस’चे फ्रेंच राष्ट्रगीत ब्रिटिश वाद्यांतून वाजवून, ब्रिटिश सिंहाच्या छाव्यांनी तिचा जयजयकार करण्यासाठी आपापल्या टोप्या काढून तिला मुजरा करण्याचा वार्षिक संप्दराय सुरू केला आहे, त्या जोन ऑफ आर्क वीरांगनेचे ब्रिटिश सिंहाने कसकसे धिंडवडे काढले, या गोष्टी बदललेल्या दृष्टीकोनाला आज जरी दिसू शकल्या नाहीत, तरी इतिहासाचा कप्पा चढविल्यास त्या धिंडवड्यांचा बीभत्सपणा वाटेल त्या आंधळ्याच्या खास प्रचितीस येईल. शेंदाड बोरबोन राजांच्या लाथांबुक्क्यांखाली धुळीस मिळालेल्या फ्रेंच राष्ट्रात आत्मसामर्थ्यांच्या चैतन्याची फुंक मारून त्याला खडबडून जिवंत करणा-या नरेंद्र नेपोलियनाची विल्हेवाट याच स्वातंत्र्यप्रिय ब्रिटिश केसरीने कशी लाविली, त्याचा इतिहास फ्रेंच राष्ट्र आज जरी विसरले असले, तरी ब्रिटिश सिंहाच्या त्या अधम कर्माची आठवण इतिहास मात्र कदापि विसरणार नाही अशी अनेक उदाहरण देता येतील. सारांश ब्रिटिश सिंहाच्या तोंडून एखाद्या राष्ट्राच्या स्वातंत्र्योपासक नरेन्द्राला शाबासकी मिळण्याचे भाग्य सशाच्या शिंगप्राप्तीइतकेच सोपे आहे, असे विधान करण्यास साहित्याचा तुटवडा मुळीच पडणार नाही. दृष्टिकोन बदलल्यामुळे असो, परिस्थितीची लाट उसळल्यामुळे असो किंवा काळाच्या करणीचा प्रभाव असो, ज्या ब्रिटन देशाच्या बखरकारांनी शिवाजीची आपापल्या बखरीतून मनसोक्त निंदा केली, ज्या ब्रिटिश मुत्सद्यांना चोर, लुटारू, दगलबाज याशिवाय शिवाजीला दुसरे विशेषणच लावायला आळले नाही आणि पेशवाई मुशीतून निर्माण झालेल्या अनेक नराधमांच्या चिथावणीचा फायदा घऊन ज्या ब्रिटिश लोकांनी शिवाजीच्या शेवटल्या वंशजांचे एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणे हालहाल करण्यास मागे पुढे पाहिले नाही, त्याच ब्रिटिश राष्ट्राच्या प्रतिनिधीच्या हातून, त्याच स्वातंत्र्यभूमीच्या उद्यांच्या नरेशाच्या हातून, त्याच शिवछत्रपतीच्या स्मारकाचा पाया बसविण्याचा परवा होणारा मंगल प्रसंग म्हणजे महाराष्ट्राच्या राष्ट्रीय जीवनात घडून येणारा कल्पनातीत चमत्कार होय. प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हातून वसविला जाणारा शिवाजीस्मारकाचा पाय हा महाराष्ट्राचट्या नवचैतन्याच्या इभ्रतीचा ब्रिटानियेकडून होणारा अद्भुत सन्मान होय.
राज्यारोहणप्रसंगी इंग्रजांच्या प्रतिनिधीने रायगडावर स्वतः जाऊन सिंहासनाधिष्ठित शिवरायाला अदबीने अर्पण केलेल्या रत्नजडित आंगठीचे तेज परवापासून खरेखुरे चमकू लागेल. स्वतःच्य प्राणापेक्षाही प्यार असलेल्या आपल्या शिवबाचा होणारा हा सन्मान पाहण्यासाठी सर्व ज्ञात अज्ञात मावळ्यांचे आत्मे शहाजाद्याच्या भोवती गराडा घालून उभे राहतील. स्वराज्याची आणभाक करणारा दादजी नरस प्रभू आनंदातिशयाचे हुंदक्यांवर हुंदके देत स्मारकाच्या कोनशिळेला घट्ट मिठी मारून बसेल. सय्यद बंडाला तमंचाच्या एकाच फटका-याने गारद करणारा जिवा महाल्या, सिंहगडाची नरडी रगडणारा तानाजी, उदयभानूचा कोथळा फोडणारा शेलार मामा, पावनखिंडीला पावन करणारा बाजी, स्वामिभक्तीपुढे ऐहिक वैभवाला कःपदार्थ मानणारा बाळाजी, कर्नाटकापासून कुलाब्याच्या दांडीपर्यंत भीमथडी घोडेस्वारांचा हुतुतू घालणारा नेताजी, पुरंदरच्या सौभाग्यासाठी दिल्लीरखानाची बाजी न पत्करता स्वदेहाचे राई राईएवढे तुकडे करून घेणारा रणगाजी मुरारी, समुद्रावर इतस्ततः भटकणा-या दर्यावर्दीची जंजि-याच्या नाक्यावर नाक दाबून रग जिरविणारा दर्यासारंग मायनाक, आपल्या पतित मनोवृत्तीला राष्ट्राभिमानाची वांकण देऊन चाकणच्या किल्ल्यावर प्रसिद्धीस आलेला फिरंगोजी नरसाळा, हे सारे महाराष्ट्र देवीचे प्यारे वीर महावीर स्मारक समारंभाच्या वेळी त्रैलोक्यात होणा-या शिवछत्रपतीच्या अभिनव जयजयकाराचा गजर करण्यासाठी सूक्ष्म देहाने परवा पुण्यास हजर राहतील. ब्रिटानियेकडून श्रीशिवछत्रपतीचा हा अपूर्व सन्मान म्हणजे हिंदुपदपातशाहीच्या पुनरुज्जीवनाचा उषःकाल होय. नवयुगाचा नवचैतन्याचा हा अरुणोदय आहे. या अरुणाची प्रभा महायुद्धात पतन पावलेल्या महाराष्ट्रीय वीरांच्या रक्ताने लालभडक रंगून निघालेली आहे. या अरुणोदय काळी महाराष्ट्रातील सर्व पंथभेदांनी आपापल्या द्वैतभावनांना तिलांजली देऊन, मागील इतिहासावर पडदा सोडावा; मागले अपराध उदार मनाने विसरून जावे आणि नवयुगातला महाराष्ट्राचा इतिहास पूर्वीपेक्षाही भडक रंगांत रंगविण्याची सर्वांनी एकदिलाने शिकस्त करावी, असे या श्रीशिवस्मारकाचे महात्म्य आहे. त्याचा तरुण महाराष्ट्राने अवश्य विचार करावा.
[प्रबोधन १६-११-२१]
लेख १८
कल्पनाशक्ति
नेपोलियन बोनापार्टचे एक वचन आहे की `या जगाचे नियंत्रण कल्पना करीत असते.’ सर जोशुआ रेनॉल्डस म्हणत असे की, ``सर्व कला मर्यादित आहेत; पण या जगात अनियंत्रित, मोकाट सुटलेली व त्रिभुवनात वाटेल तेथे बिनधोक जाणारी येणारी जर एखादी चीज असेल, तर ती कल्पनाच होय.’’ मानवांचे सर्व बरेवाईट व्यवहार, त्यांच्या सर्व चळवळी, उलाढाली, युद्धे या कल्पनाशक्तीच्या स्प्रिंगवरच आपापल्या हालचाली करीत असतात. ही स्प्रिंग आकुंचित झाली तर कलुषाकबजीच्या मताप्रमाणे करंगळीच्या आंगठीत हिरकणीप्रमाणे बसविता येते; तोच तिने आपला व्याप वाढविण्याचे मनात जर का आणले, तर सा-या विश्वाला गिळून तिची वृद्धीची भूक कायमच्या कायम राहते. सुखाचा सुकाळ करण्यासाठी मनुष्य आपल्या कल्पनेला शक्य तितका आंत्यंतिक तणावा देऊन वाढवीत असतो. आपले काव्य अजरामर व्हावे; इतर कवींच्या कल्पना-भांडारापेक्षा माझ्या काव्यातली कल्पना-चातुर्याची रत्ने विशेष `मोलवान व झगझगीत ठरावी आणि माझ्या कल्पनेच्या इतकी उंच भरारी या जगात कोणालाही मारता येऊ नये, यासाठी कविजन आपल्या कल्पनकतेला वावडीप्रमाणे अंतराळात उंचउंचत भिरकावीत असतात. राजकारणाचे डावपेच लढविण्यासाठी मुत्सद्दी जन आपल्य कल्पनाचातुर्याचा एक धागा शक्य तितका खोल पाताळात गाडतात, तो दुसरा धागा सा-या जगाचीही दृष्टि चकेल इतका उंच झुगारून देतात. ज्या मर्यादित बुद्धिमत्तेच्या रवीने कल्पनेच्या अफाट व अगाध सागरचे मंथन करून मानवांनी खुद्द परमेश्वराची लांबीरुंदी मापण्यास कमी केले नाही, त्याच कल्पना-मंथनातून आज बिनतारी संदेशयंत्राचे रत्न त्यांनी पैदा केले आहे आणि पृथ्वीच्या पार अंतराळात असणा-या शनिमंडळादि ग्रहांवरील रहिवाश्यांशी, रोटीबेटी व्यवहार शक्य नसला तरी निदान, संदेशव्यववहार करण्याची उमेद बाळगली आहे. सारांश, हृदयाशी संतत धडधडणा-या आत्मारामाच्या चैतन्यशक्तीच्या पाटाला पाट लावून बसणा-या कल्पनाशक्तीने आम्हा मानवांची सारी धडपड अव्याहत धडधडत ठेविली आहे. कल्पनेच्या मंत्राचा संदेश आला की आम्ही आमच्या मनाच्या स्वराज्यात हव्या त्या बातबेताचे गगनचुंबीत मनोरे भराभर रचताना आपल्या ताकदीकडे पहात नाही, बुद्धीच्या मर्यादितपणाची कुंपण आड आली तरी त्याची पर्वा करीत नाही, आणि विशेष आश्चर्याची व हास्यास्पद गोष्ट म्हणजे आमचे आयुष्य क्षणभंगुर आहे, ही गोष्ट आम्ही पार विसरून जातो. कल्पनाशक्ती स्वतंत्र, तर मनुष्य पडला सर्वस्वी परतंत्र. कल्पना चिरंजीव आणि विश्वव्यापी, तर आम्ही मर्त्य आणि मर्यादित. बसल्या जागी कल्पनेच्या जोरावर आम्ही पाताळनिवासी अमेरिकनांना आश्चर्याने थक्क करू. कल्पनेच्या सहाय्याने फिरत्या पृथ्वीला तागडीत तोलून, चंद्राच्या क्षयवृद्धीची गणिते बोलबोलता फटाफट सोडवू. पण कल्पनाशक्तीच्या धाग्याइतका आम्हा मानवांच्या आयुष्याचा धागा दणकट, टिकाऊ व चिरंजीव नसल्यामुळे, आमच्या जिवाचा दिवा विझला रे विझला की कल्पनेच्या भांडवलावर चाललेल्या मनोरथाच्या व्यापाराचे दिवाळे चुटकीसरसे वाजते. बातबेताचे किल्ले धडाधड कोसळतात. महत्त्वाकांक्षेच्या ठिक-या ठिक-या उडतात. पसरलेल्या व्यापांचे प्राण काळवंडू लागतात आणि कोठच्या कोठे या मर्त्य मानवाची संगत धरून अखेर मी खाड्यात पडले, म्हणून पश्चात्तापाच्या झटक्याने झीट येऊन कोसळणा-या कल्पनाशक्तीच्या दणक्याने सारे जग हादरू लागते.
[प्रबोधन, १६-५-२२]
लेख १९
दिग्विजयासाठी सीमोल्लंघन केलेच पाहिजे
विश्वाचा हा प्रचंड विस्तार आणि त्यातील प्रत्येक गोष्टीचा नियमबद्ध जीवनक्रम पाहिला तर आपल्या हेच प्रत्ययाला येते की तेजोनिधी सूर्यबिंबापासून तो थेड जमिनीवर सरपटणा-या कृमिकीटकापर्यंत सर्वांच गति मर्यादित झालेली आहे. सूर्याभोवती पद्धतशीर नियमाने प्रदक्षिणा घालणा-या पृथ्वी, शनि, मंगळादि ग्रहांचे भ्रमणच पहा. अकल्प्य काळापासून आजपर्यंत अगदी काटेकोर नियमाने त्यांच्या प्रदक्षिणेचा प्रवास यंत्राबरहुकूम बिनहरकत चालला आहे.
मानवी जीवनक्रमातही जननमरणादि क्रिया अशाच ताळेबंद यांत्रिक पद्धतीने मर्यादित झालेल्या आहेत. जिकडे पहाल तिकडे मर्यादा व सीमा यांची दाट काटेरी कुपणे पडलेली! चंद्राची क्षयबुद्धी किंवा रातपाळी दिवसपाळी चुकत नाही. सूर्याने कधी हक्काची रजा मागितली नाही किंवा एका दिवसाची `कॅज्युअल लिव्ह’ त्याला मिळत नाही. विश्वयंत्राच्या अमुक चक्राची अमुक अमुक फे-यांची प्रदक्षिणा झाली की पठाणी किंवा काश्मिरी औरताप्रमाणे सूर्याला बुरखा घातला पाहिजे, किंवा चंद्राने काळी घोंगडी पांघरली पाहिजे, असा वटहुकूम निघाल्यावर सूर्याला किंवा चंद्राला अखिल विश्वात अपिलाचे कोर्ट लाभत नाही. प्राणी जन्माला आला की यथाकाळी मेलाच पाहिजे; त्याला सुटकेची सवलत नाही. सारांश, विश्वातल्या यच्चयावत गोष्टी ठरावीक साचाच्या जीवनक्रमात जाम उखडल्या गेल्या आहेत. कोठे कोणी तसूभर सीमोल्लंघन करू म्हणेल तर होणेच नाही. विश्वनिर्मित्या चैतन्यशक्तीचा दरारा असा मोठा करडा आहे.
विश्वाचे परिभ्रमण जर एखाद्या गिरणीप्रमाणे साच्यातल्या साच्यात सीमाबद्ध झाले आहे आणि आपली पृथ्वीही त्या भ्रमात गतिबद्ध झालेली आहे, तर तिला नानारत्ना वसुंधरा कोणी बनविली? दिवसेंदिवस पृथ्वीतलावर असंख्य लोकोत्तर चमत्कारांची जी कल्पनांची उत्क्रांती होत आली आहे; मानवांनीच शोधून काढलेल्या नवरसांचा मानवी जीवनात जो नवरंगी परिपाक उतरला आहे आणि सृष्टीविधात्याच्या सृष्टीला बिनतोड तोंड देणारी दुसरी सृष्टी निर्माण करण्यात मानवांच्या महत्त्वाकांक्षेच्या ज्या अनंत धडपडी आज मानवी दुनियेच्या चैतन्याला हाताबोटांवर नाचवीत आहेत, त्याला कारण कोण?
कालची दुनिया आज नव्हे, आजची दुनिया उद्या नव्हे. कालची कल्पना आज शिळी ठरते, आजच्या कल्पनेला उद्यांची उत्क्रांत कल्पना चारीमुंड्या चीत करते. अंगाला रंग फासून ढोरांची कातडी पांघरण्यातच जीवितसौख्याची परमावधी मानणारी कालची राष्ट्रें, आज सा-या जगाला पाटलूण नेकटायचे धडे देणारी आणि सा-या वसुंधरेच्या ज्ञात अज्ञात संपत्तीचे खरे भोक्ते काय ते आम्ही, अशा वल्गना करणारी राष्ट्रे बनतात; तर ऐहिक वैभवाच्या धवलगिरीवर जाऊन आत्मानात्म विचारांची बिकट त्रांगडी चुटकीसरशी सोडवून दाखविणारी प्राचीन राष्ट्रे सा-या जगाचे हुकमी हमाल बनतात. ज्यांच्या नाकाचा दांडासुद्धा धड उमटलेला नाही, किंवा ज्यांच्या शरीराची उंची चार साडेचार फुटांवर गेलेली नाही असले बुटबैंगण फेपटे जपानी, लांबटांग्या व लांबनाक्या रशियाचे नाक कापतात; तर इकडे शरीरावयवांच्या पूर्ण वाढीत जगाला हार न जाणा-या हिंदुंच्या घरात त्याच फेफट्या जपानी विप्रांच्या आगपेटीच्या चकमक-यंत्राशिवाय चूल पेटत नाही की दिवा लागत नाही. ऋग्वेदयुगात पंचमहाभूतांचे केवढे बंड! त्या बेट्यांनी प्रत्यक्ष परमेश्वराचे सिंहासन पादाक्रांत केले होते आणि आपल्या भयंकर स्वरूपानी चळचळा कापावयास लावलेल्या मानवी दुनियेला आपल्या पायाची धूळ चाटावयास लावले होते. पण आज? आज काय प्रकार आहे? आज तीच पंचमहाभूते मानवांच्या हातचे हंटरचे तडाखे खात, निमूटपणे वाटेल ते काम करण्यासाठी गुलामांपेक्षा गुलाम होऊन बसली आहेत. जी पूर्वी देव म्हणून दुनियेच्या उरावर बसला होता, तोच आज राजमहालापासून शौचकूपापर्यंत त्याच दुनियेचे वाटेल ते काम करणारा हांजीहांजीखोर दास बनला आहे. ज्या गोष्टी पूर्वी अशक्य कोटीत मोडत होत्या आणि शक्य कोटीत मोडल्यात तर अद्भुत चमत्काराची ओढणी घेत असत, त्याच गोष्टी आजच्या शास्त्रीय युगात पोराटोरांची खेळणी होऊन बसल्या आहेत. हा सर्व चमत्कार कशाचा? मानवी दुनियेच्या एकंदर हालचालींचे निरीक्षण केले तर असे स्पष्ट दिसून येते की आपल्या शक्तियुक्तीची शिकस्त करून परमेश्वराचे नारायणपद पटकवण्याचा नरांनी स्पष्टस्पष्ट चंग बांधला आहे. परमेश्वराविरुद्ध मानवांनी उघड उघड बंडाचे शिंग फुंकले आहे. विश्वनियामक सीमांचे उल्लंघन करून सृष्टिविषयक प्रचलित कल्पनांच्या रूढींचे तट जमीनदोस्त करण्याचा हा निश्चयी हल्ला आहे. वातावरणाच्या थरांची लांबी, रुंदी, उंची मोजली, गुरुत्वाकर्षणाचा कायदा कोठवर अंमलात आहे त्याचा पाहणी केली, दुर्बिणीच्या डोळ्यांतून शनि, मंगळादि ग्रहांना नेत्रकटाक्षाची मुकी सलामी दिली.
येथे मानवी यत्नांच्या झटापटींना सीमेची अटक होते न होते तोच मार्कोनीच्या बिनतारी यंत्राने आकाश पाताळाला चिमटीत धरून पृथ्वीच्या गोलाची दामटी केली आणि वातावरण गुरुत्वाकर्षणादींच्या सीमांची अटक लाथाडून मंगळावरील रहिवाश्यांशी प्रत्यक्ष संभाषणाच्या योगाची सिद्धी साधण्यासाठी कंबर कसली. निसर्गाच्याही नरड्यावर पाय देऊन नरांनी नारायणपद मिळविण्याचा हा जो खटाटोप चालविला आहे, प्रत्यक्ष मानवसमाजात उत्क्रांतीचे आणि उपक्रांतीचे भरती ओहोटीचे जे ट्रान्सफर सीन प्रत्यही आपल्या दृष्टीला पडत आहेत आणि शास्त्रीय शोधांनी विश्वाच्या ठरावीक सीमा उल्लंघून प्रत्यक्ष ईश्वराचेही सिंहासन डळमळविण्याचा जो यशस्वी बंडाचा हल्ला चढविला आहे, त्याच्या मुळाशी असे कोणते चैतन्य आहे, कोणती शक्ती आहे, कोणचा पराक्रम आहे? जे सीमोल्लंघनाचे धडस सूर्य करू शकला नाही, चंद्राची छाती झाली नाही, विक्रम राजाच्या हाती तेल्याचा घाणा देणा-या शनि तेल्याचे तोंड नाही, किंवा महाक्रूर म्हणून गाजलेल्या मंगळग्रहाची माय व्याली नाही, तेच धाडस माणूस करतो, ते कशाच्या जोरावर?
बुद्धिमत्तेच्या जोरावर
बुद्धिमत्तेच्या प्रचंड शक्तीचा विचार केला तर असेच म्हणावे लागते की मनुष्याला ही शक्ती देण्यात ईश्वराने मोठीच चूक केली. ईश्वराने आपल्या निःश्वासाने सृष्टि निर्माण केली असेल, पण बुद्धिमत्तेचे कवच ल्यालेला मनुष्य सहज फुंकाराने त्याच्या अस्तित्वाचे सिंहासन यथाकाळी पादाक्रांत केल्याशिवाय खास राहणार नाही. बुद्धिमत्तेची प्रचंड शक्ती मनुष्यात जन्मतःच असल्यमुळे, सीमोल्लंघन हा त्याचा जन्मसिद्ध हक्कच होऊन बसला आहे. याच्याही पुढे जाऊन असे म्हणता येईल की सीमा – मग त्या कशाच्याही असोत, त्यांचे दास्य जो मान्य करील तो मनुष्यच नव्हे. अटकेला अटक, सीमेवर कुंठीत झाला, निर्बंधात जखडून पडला, प्रामाण्यांचा गुलाम झाला आणि रूढीच्या उकिरड्यातला किडा बनला की मानवाचा मानवपणा ठार झाला असे खुशाल समजावे. मनुष्य आणि दास्य परस्परविरोधी आहेत. स्वातंत्र्य हा मानवजातीचा प्राण आहे.
दिग्विजयी म्हणून इतिहासात गाजलेल्या कोणत्याही स्त्रीपुरुषांचे चरित्र पहा, त्यात त्यांनी रूढ कल्पनांच्या सीमांचे उल्लंघन केल्याचेच आपल्याला दिसून येईल. हे सीमोल्लंघन करताना त्यांनी राजकीय सत्तेच्या स्वार्थी निर्बंधांची पर्वा ठेविली नाही. `ईश्वरप्रणित’ `धर्ममान्य’ `स्मृति पुराणोक्त’ इत्यादी मूर्खपणाच्या लोकमान्यतेस चढलेल्या महानुभावांच्या `हीरो वर्शिप’ (महात्मेगिरी)च्या मिंधेपणाचे ते शरमिंदे बनले नाहीत. कल्पनेच्या बंदुकीत ठासलेला बुद्धिमत्तेचा बार उडविताना, निश्चित तत्त्वावर रोखलेले त्यांचे निशाण अणुमात्र कंप पावले नाही. कोलंबसाच्या वेळी क्रिस्ती धर्ममार्तंडांचे पृथ्वी विषयक ज्ञान अकटोविकटो होते. `देव म्हणाला उजेड होवो आणि उजेड झाला.’ अशा रीतीने सहा दिवस जग उत्पन्न करण्याची दगदग करून सातव्या दिवशी `प्रभु निजला’, या दिव्य धर्मज्ञानप्रणेत्या पाद्रीभटांना पृथ्वी त्रिकोणी आहे, चौकोनी आहे की वाटोळी आहे याची मुळीच दाद नव्हती. कोलंबस ज्या वेळी महासागरोल्लंघनला सिद्ध झाला, तेव्हा हे रावरंकाच्या `आत्म्याचे तारक’ त्याला गयावया करून म्हणाले, ``अरे बाबा, हे कसले मूर्खपणाचे धाडस तू आरंभले आहेस. समुद्राच्या अगदी कडेवर गेलास तर नरकाच्या दरीत तुझा, तुझ्या गलबताचा आणि परिवाराचा कडेलोट की रे होईल!’’ परंतु बुद्धीच्या जोरावर रूढ कल्पनांचे धिटाईने सीमोल्लंघन करण्यास सज्ज झालेल्या त्या नवमतवाद्याला ही बायबलोक्त बाष्कळ गुलामगिरी काय होय? त्याने कोणाच्याही पर्वा न करता धडाडीने आपली गलबते हाकारली आणि अमेरिकेचा शोध लावून `पृथ्वी वाटोळी आहे, क्रिस्ती भटांच्या कल्पनेप्रमाणे सपाट नाही’ हे प्रत्यक्ष पुराव्याने सिद्ध केले. सामाजिक क्षेत्र घ्या, धार्मिक घ्या किंवा राजकीय घ्या, त्यात आजपर्यंत जी उत्क्रांती घडून आलेली आहे, ती धूर्त मुत्सद्यांच्या राजकीय सवलतींनी किंवा स्वराज्याच्या हप्त्यांनी नव्हे, जगद्गुरु किंवा पोपासारख्या गुलालगोट्यांच्या श्रुतिस्मृतिपुराणोक्ताने नव्हे, वाचीवीर्य पुराणिकांच्या तोंडपाटीलकीमुळे नव्हे, तर स्वतंत्र नवमतवाद्यांच्या महत्त्वाकांक्षेच्या धडाडीनेच होय. गौतम बुद्ध, शिकंदर, चंद्रगुप्त मौर्य, अशोक, गॅलिलिओ, न्यूटन, मार्टिन लूथर, सावनारोला, शहाजी राजे, छत्रपती शिवाजी, इत्यादि अनेक पुरुषोत्तमांची चरित्रे याच तत्त्वांची द्योतक आहेत.
दिग्विजयाची आकांक्षा नखशिखांत फुरफुरल्याशिवाय सीमोल्लंघनाची बुद्धीच होत नाही. जोपर्यंत ही आकांक्षा हिंदुजनात फुरफुरत होती, तोपर्यंतच ते स्वातंत्र्याचे भोक्ते व प्रणेते राहिले. जेव्हा दिग्विजयाची आकांक्षा थंड पडली, तेव्हापासूनच हिंदूंच्या अधोगतीला सुरुवात झाली. सीमोल्लंघनाचा संन्यास करून ते व्यक्ति ग्रंथ व रूढिप्रामाण्यांच्या कच्छपी लागले आणि अखेर निर्भेळ गुलामगिरीचे जहागीरदार बनले. स्वातंत्र्य किंवा दास्य यांचा गुणधर्मच असा आहे की ती भलत्या नापीक क्षेत्रात आपण होऊन कधी जात नाहीत. पण जरा कोठे बुद्धिभ्रंशाच्या उमटलेल्या टाचेच्या खळग्यात कुकल्पनेचे घाणेरडे पाणी साचले की गुलामगिरीने तेथे आपले बीज पेरलेच म्हणून समजावे. `हिंदुमुसलमानकी जय’ म्हणून दुटप्पी लुब्रे लोक कितीही शंख करोत, हिंदुस्थानच्या प्रगतीतील मुसलमानांच्या ऐक्याची आवश्यकता काही विवक्षित मर्यादेपर्यंत असो वा नसो, हिंदु साम्राज्य, हिंदु संस्कृती, हिंदुस्थान म्हणून काही चीज आहे की नाही? मुसलमान तरी आले कोठून? हिंदुंच्या धार्मिक अधःपातातूनच मुसलमानांची पैदास झाली ना? त्यातूनच आज क्रिस्त्यांची वीण निपजत आहे. आहे हीच नामर्द स्थिती कायम असेपर्यंत आणखी काय काय चिजा पैदा होतील कोणी सांगावे? अर्थात हिंदुंना पुनरुज्जीवनाची जर काही जाणीव उत्पन्न झाली असेल तर त्यांनी `हिंदू आणि मुसलमान’ असली पोरखेळणी साफ लाथाडून देऊन दिग्विजयाच्या निश्चयाने सीमोल्लंघनाचीच तयारी केली पाहिजे. देवळे जाळणे, मूर्ति फोडणे, बायका भ्रष्ट करणे आणि गाई कापणे वगैरे महंमदी गझनवी अत्याचार आज १९९२सालातही हिंदूंच्या नाकाडावर टिच्चून होत असता, `अरे यार मेरा भाई’ म्हणून हिंदूंनीच मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळणे, या स्थितीला बेशरमपणापेक्षा दुसरा निराळा शब्द शब्दकोशात कदाचित असेल. मुसलमानांप्रमाणे आजला पारशी, क्रिस्ती, यहुदी आपापले समाजसंघ बळकट बनवीत आहेत. धोतरवाला तात्या म्हणजे त्यांच्या थट्टेचा परसातला सवंग विषय. वाटेल त्या गुंडाने उठावे, बंदुका झाडाव्या, हिंदू स्त्रियांचा उपमर्द करावा, वाटेल ते करावे; पण हिंदुजनांकडे पहावे, तो स्थितप्रज्ञ स्थिति. परवा परळच्या बाजूला गणेशोत्सवाच्या पंधरवड्यातच पाळीव कुतरड्यांच्या क्षुल्लक भांडणावरून एका पारशी सज्जनाने आपली बंदूक झाडून खुशाल १०-१५ गरीब गिरणीकामगारांना जखमी केल्याचे समजते. १६ नंबरच्या दंग्यात अकरमाशा युरेजियन व अग्निहोत्री पारशी गुंडांनी पिस्तुलांच्या बेगुमान फैरी झाडल्याचे प्रसिद्धच आहे. त्यांनी अनंत अनिर्वचनीय अत्याचार केले. पण स्थितप्रज्ञ हिंदुजन तोंडातून ब्र काढतील तर ब्रह्माचीच शपथ! याला गांधीभक्त आत्म्याचा विजय, सत्याचा विकास वगैरे काय वाटेल ती नावे देवोत; असला विजय आणि विकास शामळू गुजराथेला लखलाभ असो. शिवाजीच्या महाराष्ट्रात असल्या प्रकाराला भ्याडपणा, नामर्दपणा किंवा शेंदाडपणा हीच नावे देण्यात आली, येतात व येतील. सारांश, हिंदुस्थानातला इतर हिंदू समाज वगळून, प्रत्यक्ष माहितीने, खुद्द महाराष्ट्रापुरतेच बोलले तर महाराष्ट्रीय हिंदू समाजाची आजची स्थिती केविलवाणी झाली आहे. फक्त कीवच करायला कोणी नाही!
अखिल हिंदुस्थानच्या राजकीय रुधिराभिसरणाचे मुख्य हृदय महाराष्ट्रच. ही गर्वोक्ती नव्हे. इतिहासप्रसिद्ध प्रतिज्ञेची उक्ति आहे. अर्थात हिंदूंच्या दिग्विजयाचा प्रश्न महाराष्ट्रानेच उचल खाल्ल्याशिवाय रंगारूपास येणे शक्य नाही. पण आजचा महाराष्ट्र कसा आहे? काय करीत आहे? राजकीय क्षेत्रांत ढोंगी पुढा-यांच्या सुळसुळाटामुळे ती परप्रत्ययनेय व आत्मवंचक बनला आहे. धार्मिक क्षेत्रात तो हटवादी मत्सरी आणि स्वार्थपरायण आहे. सामाजिक क्षेत्रात तर त्याच्या विराट देहाचे राई राई एवढे लचके तुटले आहेत. जातिद्वेषाचा तुफानी झंझावात बेफाम बोकाळल्यामुळे ब्राह्मण-ब्राह्मणेतरासारखे वाद आज हातघाईवर आले आहेत आणि उद्या ब्राह्मणसंघाचा जन्म होताच हे प्रकरण रक्तपातावर न जावो म्हणजे मिळवली. सातारा नगरकडून मगरूर भिक्षुकशाहीवर झुगारलेली ब्राह्मणेतरांची पाचर परवा खुद्द टिळकांच्या गायकवाड वाड्याच्या छातीत तर बिनचूक जाऊन रुतलीच आहे. सारांश, सांप्रतचा महाराष्ट्र हा शिवाजीचा महाराष्ट्र या नावाला सर्वथैव अपात्रच नव्हे तर कुपात्र बनलेला आहे.
असा प्रसंगी शिवाजीच्या अभिमान्यांनी पेशव्यांच्या सैतानशाही सांप्रदियाकांना कोपरखळी मारून दूर बसविले पाहिजे आणि महाराष्ट्राची अब्रु वाचवण्यासाठी मी मी म्हणून पुढ सरसावले पाहिजे. असे करताना कोणी ब्रह्मांडशहाणे तुमच्यावर वाटेल ते कुत्सित आरोप करतील; पण सबंध शरीराच्या हितासाठी उपायापलिकडे गेलेला एकादा नासका कुसका अवयव छाटून टाकणे हेच श्रेयस्कर असते, हे विसरू नका. छत्रपति शिवाजी महाराजांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याच्या गडाखाली स्वार्थी कारस्थानांचा सुरुंग उडवून, त्यांच्या मनोदयाचा भिक्षुकशाहीने केलेला भंग हे एक महाराष्ट्राच्या हृदयात नित्य सलणारे शल्य आहे. शिवाजीच्या जातिवंत अभिमान्यांनी हे शल्य सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रांत पदोपदी अडविणा-या सीमांचे उल्लंघन केले तरच महाराष्ट्राला या उप्पर दिग्विजयाची काही आशा आहे. महाराष्ट्रात लोकशाही बळावल्याशिवाय हिंदुस्थानाचा भाग्योदय होणे नाही, एवढी खूणगाठ बांधून महाराष्ट्राची चैतन्यदेवता – हिंदुस्थानची भाग्यदेवता – ज्याला जशी बुद्धि देईल तसे त्याने देशोद्धारार्थ दिग्विजयासाठी सीमोल्लंघन करावे.
[प्रबोधन, १-१०-२२]
लेख २०
सर्वसमर्थ कोण?
``God helps them who help themselves’’ –
पारतंत्र्यातर्भूत असलेल्या दारिद्र्य, अज्ञान आणि द्वैत यांच्या खोल कुंडात कुजत पडलेले एकादे राष्ट्र उदयास यावे, आणि त्यावर स्वातंत्र्यातर्भूत लक्ष्मी सरस्वतीच्या ऐक्याची सुवर्ण किरणे चमकू लागावी, अशा उदात्त व श्रेष्ठ विचारांवर ज्या ज्या व्यक्तीचे प्रयत्न चाललेले असतात, त्यातच एक निर्जीव (?) पदार्थ आपली सर्व शक्ति एकवटून त्या त्या व्यक्तींना पूर्ण उत्तेजन देत असतो. आजपर्यंत पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांत ज्या घडामोडी झाल्या; कोठे धर्मोन्नती तर कोठे अधर्मप्रवृत्ती; कोठे संतमंडळांचा उदय तर कोठे दुर्जनांचा सुळसुळाट; कोठे राजे महाराजे स्वपराक्रमाने तलवारीच्या धारेवर कमाविलेल्या एकाद्. अफाट प्रदेशाच्या राज्यासनावर स्वतःस राज्याभिषेक करून घेत आहेत, तर दुसरीकडे कित्येक नरपति कर्मगतीच्या भोव-यात सापडल्यामुळे आपल्या वंशपरंपरेच्या मयुरासनाला किंवा सिंहासनाला दुःखाश्रूंनी चिंब भिजवून त्यांचा शेवटचा निरोप घेत घेत त्यांना आपल्या विजयी जेत्याच्या स्वाधीन करीत आहेत; एकीकडे स्वातंत्र्याचा लख्ख उजेड तर दुसरीकडे पारतंत्र्याची काळीकुट्ट अमावास्येची रात्र; एका प्रदेशात अज्ञानाच्या रानटीपणाचा कळस, तर दुसरा प्रांत सभ्य सुधारणेच्या नंदनवनात विहार करणारा मूर्तिमंत वसंत; इत्यादी*५ सर्व घडामोडींच्या क्रांतीला कारण तो एकटा निर्जीव पदार्थच होय. अलेक्झांडर धी ग्रेट (शिकंदर) याला हिंदुस्थानच्या त्तर सरहद्दीवर स्वारी करून पोरसराजाला खाली तरवार ठेवण्यास भाग पाडण्याची जी स्फूर्ति झाली; तैमूरलंगाने हिंदुस्थानात जी लुटालूट केली, त्यानंतर नादिरशहाने दिल्ली राजधानीत जी भयंकर अमानुष कत्तल केली आणि सोनपत पानपतच्या भारतीय युद्धात महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी जी हानी अहमदशहा अबदल्लीच्या सैन्याकडून केली गेली, या सर्वाला कारण कोण? हाच. रंगपंचमीच्या दिवशी जाधवराव सिंधखेडकराच्या दरबारी महालात त्याच्या मांडीवर क्रीडा करणा-या लहान बालबालिकेचे गोजिरवाणे जोडपे पाहून त्याच्या तोंडून ``हा जोडा छान दिसतो’’ या निघालेल्या शब्दांवर त्याला लग्नाच्या पेचांत आणण्याची स्फूर्ती व युक्ती त्या मालोजी बारगीराला कोणी दिली? यानेच. सनातन धर्माचा ठिकठिकाणी भ्रष्टाकार व उच्छेद चालले, गोब्राह्मणहत्येचा सुलसुळाट सुरू, देवळांच्या ठिकाणी शुभ्र मशिदीचे घुमट झळकत आहेत. अशा स्थितीत त्रस्त भूमातेने श्रीशंकराकडे आपल्या तरणोपायाची विनंती करण्याकरिता वकील पाठविला तो कोण? हाच. शिवाजीचा स्वधर्मस्थापनेचा दृढ निश्चय झाल्यावर त्या भूसेवारूपी बायबलाचा उपदेश सर्वत्र प्रसृत करण्याकरिता प्रयागजी अनंत फणसे, विश्वासराव नानाजी यांच्यासारखे जे वीर-मिशनरी स्वयंस्फूर्तीने बाहेर पडले, त्यांच्याबरोबरही हा होताच. एवंच जिकडे पाहावे तिकडे तो सर्वसमर्थ निर्जीव पदार्थ आहेच आहे. तो जर या पृथ्वीवर नसता तर सृष्टिक्रमाचा ओघ पुढे न जाता तो मागेच कोठे तरी थांबला असता. पण नाही. तशी ईश्वराची इच्छा नाही. तो असल्याशिवाय सृष्टि-रंगभूमीवरील नाटकास रंग येत नाही. सर्व नाटकांचा सूत्रधार हाच. याने अनेक नाटके रंगविली आहेत. कोंडाणा उर्फ सिंहगडावर अर्धचंद्राकृती हिरवे निशाण डुलताना पाहन त्या गडाला काबीज करण्याकरिता माता जिजाईने शिवबाला जो हुकूम फर्मावला, याचा कानमंत्र तिला यानेच सांगितला. असा हा निर्जीव पदार्थ कोण? निर्जीव म्हणावा तर सजीव व ज्ञानी म्हणविणा-या हल्लींच्या मानवापेक्षा तो जास्त कर्तव्यशक्तीचा दिसतो मुका म्हणावा तर C.S.I., G.C.S.I., पेक्षा इत्यादी पदव्यांची शिंगे शपेट्या बालगणा-या कौन्सिलरांपेक्षा तो फार स्पष्टवक्ता आहे. बरे, बहिरा किंवा आंधळा म्हणावा तर वॉरन् हेस्टिंग्ज् साहेबाने अयोध्येच्या बेगमांपासून पडद्याआड घेतलेला लाखो रुपयांचा खजिना त्याने प्रत्यक्ष पाहिला; आणि न्यायबुद्धीच्या पावित्र्याबद्दल ख्यात असलेल्या इंग्रजांचा प्रपितामह जो राबर्ट क्लैव्ह याने उमीचंदाला धडधडीत खोटा दस्तऐवज करून फसविताना प्रथम यानेच पाहिले.
तेव्हा हा निर्जीव-सजीव, मुका-स्पष्टवक्ता आणि अंध-डोळस कोण? सत्यासत्याचे सिद्धांत सोडविणारा रँग्लर हाच. रंकाचा राव व रावाचा रंक करणारा गारुडीही हाच. असा तो गारुडी कोण? तो कोठे आहे? तो प्रत्येक राष्ट्रांत असतो. इतकेच नव्हे तर तो सर्व आबालवृद्धांस पूर्ण माहीत आहे. प्रत्येक देशात ज्या लहान मोठ्या चळवळी सुरू होत्या, आहेत आणि पुढे होतील, त्या सर्वांना मूळ कारण होता. एलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीत इंग्लंडमध्ये प्रॉटेस्टंट व कॅथलिक धर्मकलहाची योग्य संधी पाहून स्पेन राष्ट्राने आपले जगविख्यात `स्पॅनिश आरमॅडा’ भव्य आरमार, इंग्लंडावर स्वारी करून त्यास जिंकण्याच्या स्फूर्तीने जेव्हा अटलांटिक महासागरात लोटले आणि ``Rule Britania rule, Britania rule the waves. Britons never shall be slaves.’’ (ब्रिटानिया महासागरावर राज्य करो. ब्रिटनलोक कधाही गुलाम होणे शक्य नाही.) या गर्विष्ठ कव्युक्तीला हाणून पाडण्याच्या महत्त्वाकांक्षेने, स्पेनचे दर्यावर्दी वीर आपला राष्ट्रीय झेंडा ब्रिटानियावर फडकविण्यासाठी स्पॅनिशभूमीचा निरोप घेऊन आरमाराची शिडे हवेत मोकळी सोडून जेव्हा निघाले तेव्हा, `या परकीय टोळधाडीवर तुटून पडून ब्रिटनचे सौभाग्य रक्षण करण्यासाठी सर्वांनी धर्मकलह बंद ठेवून एक व्हावे आणि ब्रिटानियाच्या एकीचा तडाखा या स्पेनला दाखवून युद्धाच्या विजयोत्सवानंतर वाटेल तर धर्माच्या उलाढाल्या कराव्या,’ असा उपदेश एलिझाबेथने सर्व ब्रिटन राष्ट्रीयांना दिला, तो कोणाच्या उत्तेजनाने बरे? याच्याच. पुढे त्याच अटलांटिक महासागरात इंग्लंडने स्पेनच्या आरमाराचा पार धुव्वा उडवून, गेल्या रूसीजपानी युद्धातील पौर्वात्य पराक्रमाचा वामनावतार होईपर्यंत आपले जलयुद्धसामर्थ्य जगातील सर्व राष्ट्रांच्या निदर्शनास आणिले, ते कोणाच्या बळावर? याच्याच. सतत दहा वर्षे पारतंत्र्यांत राहून शेवटी कर्नल हेन्री पॅट्रीकच्या वीस पंचवीस ओळींच्या व्याख्यानाने अमेरिकन युद्धाचा पाया घालण्याची जी स्फूर्ती अमेरिकनांस प्राप्त झाली, व त्यांनी स्वतंत्र अमेरिकन संस्थानांची स्थापना केली, त्या कर्नलच्या वाक्शक्तीत इतकी प्रज्वलित चमके कसली भरली होती? याचीच. असा हा सर्वसमर्थ कोण? अज्ञानांधःकारातून व दारिद्र्याच्या तीव्र कचाट्यातून धडपडत तडफडत ज्ञानरवीच्या उज्वल प्रकाशात येण्यास, जे एकादे राष्ट्र पुढे पाऊल टाकते त्यास मागाहून हाच नेट देत असतो. पूर्वजांची व वंशजांची स्थिती वर्णन करून वंशजांना जागृति देणारा आणि त्यांच्या हल्लाकीबद्दल पूर्ण निषेध व्यक्त करून त्यांच्या नसांतल्या रक्तास कर्तव्याची उसाळी मारावयास लावणाराही हाच. असा हा सर्वव्यापी गुप्त पराक्रमी कोण? तर –
प्रत्येक राष्ट्राचा इतिहास
प्रत्येक राष्ट्राला इतिहास हा अत्यावश्यक आहे. तो कधीकधी भरभराटीत असतो, तर केव्हा केव्हा त्याला पालनपोषणाच्या अभावामुळे घरघराटही लागतो. याला कारण फक्त त्या त्या राष्ट्राची स्वतंत्र व परतंत्र स्थिती हे होय. राष्ट्र स्वतंत्र असले म्हणजे तेथील लोक इतिहासाची बरदास्त फार चांगली ठेवितात. व तेच राष्ट्र परावलंबनात गुंग झाले की, इतिहासही त्याच्याबरोबर दास्यत्वाची कडू फळे चाखीत पडतो. स्वतंत्र राष्ट्रांनी लिहिलेला स्वतःचा इतिहास आणि जेत्या राष्ट्राने जित राष्ट्राकरिता लिहिले इतिहास यात काळ्या पांढ-या इतके जमीनअस्मानाचे अंतर असते. खरा इतिहास फार जाज्वल्य स्वरूपात असतो. त्याचा प्रकाश वेळी सूर्यास दिपवितो असे कवि आपल्या कल्पनेने भासवितात. ख-या इतिहासाला पदव्यांची जरूर नसते. त्याला कोणाची हांजी हांजी करणे बिलकूल खपत नाही. त्याला राजा काय प्रजा काय सर्व सारखे. तो राणीसरकारच्या जाहिरनाम्याने हुरळून जाणारा नाही किंवा वंगभंगामुळे खवळून जाणारा नाही. त्याला दिल्लीदरबारची फारशी किंमत वाटत नाही किंवा कलकत्त्याच्या ब्लॅकहोलची करुणा येत नाही. तो बोरवॉर, रुसोजपानी वॉर, पानपतचे भारतीयुद्ध यांच्या तोफांचा गडगडाट व भडिमार पाहून गांगरून जाणारा नव्हे, किंवा इंडिय पिनलकोडाच्या शाब्दिक कलमांनी केली जाणारी शिक्षा ऐकून हतबल होणारा नव्हे. याच्या दरबारात वा-याच्या क्षुल्लक झुळकेचाही रिपोर्ट दप्तरी दाखल असतो.
राष्ट्राच्या सरहद्दीवर राष्ट्रसंरक्षणार्थ जे सैन्य पहारा करीत असते, त्याच्याबरोबर इतिहासही पहारा करीत असतो. खरे कोणते व खोटे कोणते, तसेच खरे किती व खोट्याची भेसळ किती, याचे तंतोतंत प्रमाण दाखविणारा काटा त्याच्या दरबारी आहे; परंतु हाताच्या न्यायाच्या समबुद्धिदर्शकतेची तराजू घेतलेली पुतळी त्याने आपल्या ऐतिहासिक दरबाराच्या इमारतीवर उभी केलेली नाही. आम्ही खावे आम्ही प्यावे आणि जमाखर्च तुमच्या नावे ही आपमतलबी राज्यपद्धत ख-या इतिहासाला बिलकूल आवडत नाही व तिचा तो जोराने निषेध करितो. अधोगतीच्या वेळी उपदेशाचे चार शब्द सांगून वाटेल त्याला तो उन्नत्यर्थ मदत करितो, परंतु `कोणाचीच उन्नती न होता माझी मात्र तुंबडी भरली पाहिजे, ही स्वार्थसाधुपणाची शक्कल त्याला बिलकूल माहीत नाही. इतक्या निःस्पृहतेने तो राहात आहे. कोणाच्या सुतळीच्या तुकड्याचीही अपेक्षा न करिता परोपकारार्थ आपला देह पूर्ण झिजवीत असता त्याचेराज्य व दरबारी थाट आज हजारो शतके बाधित व निष्कंटक चालला आहे; आणि दुस-या बाजूकडे अर्थात् मानवी सृष्टीकडे नजर फेकावी तो `परोपकाराय इदं शरीरम्’ची नौबद चांगली ठणठणत असता शेकडो राजक्रांत्या झाल्या व होत हेत व पुढेही हाच क्रम चालावयाचा!
ऐतिहासिक चळवळ ही प्रत्येक राष्ट्रीय चळवळीचे प्रधान अंग आहे. या चळवळींशिवाय इतर चळवळी व्यर्थ होत. सर्व सुधारणात समाजसुधारणा प्रथम अत्यवश्यक आहे. असल्या सर्व प्रकारच्या सामाजिक व राष्ट्रीय चळवळींची धोरणे कशी असावी हे इतिहास समजावून सांगेल. अमक्या प्रकारच्या चळवळीचा शेवट अमक्यात होईल, हे इतिहास सप्रमाण सिद्ध करील. म्हणून ऐतिहासिक चळवळीकडे देशातील लोक-धुरिणांचे लक्ष प्रथम गेले पाहिजे. ऐतिहासिक माहिती मिळविणा-या संस्था व त्यांचा प्रसार करणारे स्वयंसेवक पुढे आले पाहिजेत. करमणुकीची स्थाने इतिहासमय बनली पाहिजेत. नाटकांच्या रंगभूमीवर ऐतिहासिक वीर व वीरा यांचे प्रयोग दृष्टीस पडले पाहिजेत आणि घरी दारी सर्व ठिकाणी पूर्वजांची कृत्ये इतिहासद्वारा लहानापासून थोरापर्यंत सर्वांच्या दृष्टीसमोर मूर्तिमंत उभी राहिली पाहिजेत. इतके घडून आले तर कोणत्याही दुर्दैवी राष्ट्राने हातात माती घेतली तरी तिचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही.
यक्षिणीच्या कांडीप्रमाणे इतिहास जी अद्भुत घडामोड घडवील तशी घडविण्याची शक्ती एखाद्या तलवारबहाद्दर वीराच्या मनगटात क्वचितच आढळेल. देशाच्या कोणत्याही परिस्थितीत आबालवृद्धांनी इतिहास हा एक अवश्य वाचनापैकी भाग केला पाहिजे. आमच्या हिंदी देसबांधवांनी आपल्या राष्ट्रीय इतिहासाची फार शोधकबुद्धीने पारायणे केली पाहिजेत. इतिहासाशी ते व त्यांची मने पूर्ण संलग्न झाली की त्यांना ते ऐतिहासिक वीरपुरुष व त्यावीरांगना स्पष्ट दिसू लागतील. त्यांच्याशी ते बोलू लागताच ते वीर व वीरा त्यांना सर्व इतिहास स्वतःच बोलून दाखवितील. मराठी राज्य स्थापन केले, परंतु त्याचा नीट बंदोबस्त करण्याइतके आपल्याला पुरे आयुष्य उरले नाही, म्हमून तळमळत असलेले शिवाजीछत्रपति आक्रोश करताना दृष्टीस पडतील. स्वाभीभक्त कलमबहाद्दर बाळाजी आवजी चिटणीस आपल्या वंशजडांची लांगुलचालनाची भयंकर हाव पाहून टपटपा अश्रू गाळीत बसलेले दिसतील. निजामाला हजाम म्हणावयास न भिणारे तलवारबहाद्दर ब्राह्मणवीर आपल्या द्वैतभावी वंशजांस धिक्कार दर्शविण्यासाठी हातातील हुरडा हातात ठेवून रागाने वर पाहत असताना जोंधळ्याच्या शेतावर घोड्यावर बसलेले अजून दिसतील. रणांगणात मृत्यू न येता म्लेंच्छ शत्रूकडून गफलतीने प्राण घेण्यात आला म्हणून जनकोजी शिंदे पृथ्वीवर पुन्हा अवतार घेतलेले पाहण्यात येतील. विश्वासराव, भाऊसाहेब इराणी दुराणीच्या दुगाण्या हातात धरून अस्मानात भिरकावून देण्यासाठी त्वेषाने डोळे लाल करून दीर्घ श्वास सोडीत फूं फूं करताना दिसतील. इभ्राहीमखान गारदी स्वामीनिष्ठेची पराकाष्ठा अजूनही व्हावयास पाहिजे म्हणून दाढीमिशांवर पीळ देताना दिसेल. रामशास्त्री प्रभुणे निःस्पृहतेला हद्दपार झालेली पाहून क्रोधाने संतप्त असलेले स्पष्ट दिसतील. लालन बैरागीण सांप्रतच्या स्त्रियांची अवनति पाहून अश्रू गाळीत बसलेली इतिहासवाचकांच्या डोळ्यांना स्पष्ट दिसेल. अहल्याबाई व लक्ष्मीबाई सांप्रतच्या स्त्रीवर्गाची मानसिक गुलामगिरी पाहून त्यांचा निषेध करताना आढळतील. अशा अनेक देखाव्यांनी त्या इतिहासवाकांची वृत्ती अगदी तल्लीन होऊन जाईल. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा लोट वाहू लागेल आणि त्यांचे हृदय भरून येईल.
इतिहास हा विषयच आधी गोड व रसाळ, त्यातच आमच्या वाडवडिलांच्या कीर्तीचा सुगंध रसरसून भरलेला. मग काय, सोन्याला जर सुगंध असता तर त्याची उपमा या इतिहास विषयाला बरोबर शोभली असती. इतिहासा! तू धन्य आहेस! धन्य तू! असे शतशः धन्यवाद जरी आम्ही तुला दिले तरी ते तुझ्या उपकाराच्या मानाने काहीच नाहीत. मे गॉड ब्लेस यू! तुझे राज्य अबाधित चालो!!
[वन्दे जिनवरम, १९०८]
लेख २१
सत्ता, सत्ताधीश व सत्ताधीन
सत्ता ही एक विलक्षण स्थिती आहे. ती जितकी चित्राकर्षक आहे, तितकीच जीविताकर्षकही आहे. तिच्या अमृतसम गोडीतच हलाहल विषाची नांगी लपून बसलेली असते. सत्तेशिवाय शहाणपणाची शालजोडी अंगावर पांघरली जात नाही जितके खरे आहे, तितकेच सत्तेशिवाय अंगच्या दुर्गुणांचा तवंग उमलून बाहेर काढणारे दुसरे रेचक नाही, हेही खरे आहे. हातात सत्ता येताच इतरांना लत्ता मारण्याची ताकद येते खरी, पण अखेर स्वतः सत्तीधाशांनाच इतरांच्या लत्ता खाऊन असेल नसेल ती बुद्धिमत्ता व मालमत्ता गमावून गुलामांचे गुलाम बनावे लागते. सत्ता शराबासारखी आहे. नव्हे, ती एक स्वादिष्ट उत्तेजक पण उन्मादकारक अशी शराबच आहे, आणि ती पचनी पाडण्यासाठी कोठ्याचे आरोग्यही तसेच दणकट व खंबीर असावे लागते. याचे कारण ही सत्ता-शराब अशी चमत्कारिक मादक आहे की वेळी दारूचा नाद सुटून सारी माणसे मद्यपाननिषेधक बनतील, पण सत्तेच्या लालसेचा मानवी प्रवृत्तीला बसलेला चिकटा इतका जबरदस्त आहे की तो जगाच्या अंतापर्यंत निघणे शक्य नाही. केवळ तत्त्वज्ञानात मग्न राहणा-या स्थितप्रज्ञांना सत्तेच्या शराबाची तलफ ही चीज काय आहे, याची जरी काही कल्पना नसली, तरी जो जो म्हणून मनुष्य आहे – मग तो कसल्याही स्थितीत असो, त्याच्या कर्तबगारीचे क्षेत्र कितीही संकुचित असो – तो तो या शराबाच्या एका घोटासाठी वाटेल त्याच्या नरडीचा घोट घ्यावयाला कमी करणार नाही. जगातल्या सर्व धडपडी सत्तेसाठी चालल्या आहेत. नवेनवे शोध लावून सृष्टीच्या सर्व शक्ती हाताच्या चिमटीत पकडण्याच्या खटपटी सत्तेसाठी चालल्या आहेत. व्यापारातील चढाओढ सत्तेसाठीच चालली आहे. शिक्षणप्रसाराचा आटारेटा सत्तेसाठीच सुरू असतो. महायुद्धाची रणशिंगे सत्तेची लालसाच फुंकीत असते, आणि समरांगणावर पडलेल्या प्रेतांच्या खचांत आणि रक्तमांसाच्या चिखलात सत्तेची वर्चस्व-लालसाच कोल्ही कुत्री गिधाडांच्या बरोबरीने सर्वत्र भडकत असते. मनुष्याला आपला जीव कितीही प्यारा असला, तरी सत्तेसाठी झगडताना तो त्या जीवाचीही पर्वा ठेवीत नाही. अब्रूसाठी जीव देणारे लोक असतील, पण सत्तेचा टीचभर तुकडा पदरात पडत असेल तर अब्रूचीही पर्वा न करणारे पर्वरदिगार पुष्कळ सापडतील. दिडकी दिडकीसाठी जीवाचे रान करणारे लोक, नोकरीत एक इंच बढती मिळत असेल, तर पन्नास फूट लांबीत बसतील इतक्या रुपयांचा होम करायला मागे पुढे पाहत नाहीत. मनुष्याला आपली बायका पोरे, आईबाप, भाऊ बहिणी या फार प्रिय असतात, असा सर्वसामान्य नियम आहे; पण सत्तेच्या प्राप्तीसाठी त्यांचे बेधडक खून करणारे लोक जगात झाले की नाही? रगड झाले व रगड होतील. सारांश, प्राणीमात्राच्या सर्व धडपडीचा इतिहास ही सत्ताप्रियतचा रंगवीत आली आहे. सत्तेच्य शराबाच्या गोडीपुढे मोक्षप्राप्तीच्या गोडीलाही माणसांनी लाथ हाणलेली आहे; मग बिचा-या परमेश्वरांची क्षेमकुशलता कोण पुसणार? इष्काची नशा किंवा शराबाची नशा केव्हा तरी उतरते आणि दुसरा घोट घेण्यापूर्वी थोडा वेळ तरी माणूस माणुसकीत येतो. पण सत्तेच्या शराबाचा एकच बिंदू जिभेवर पडते की सा-या विश्वाचा स्वाहा केला तरी त्याची सत्तेची तहान भागत नाही. जॉर्ज वॉशिंग्टन पाणी पाणी करून मेला, पण शिकंदर बादशहा `पृथ्वीवर आता जिंकायलाच काही उरले नाही’ म्हणून ढळढळा रडत मेला!!
सत्तेसाठी माणसाची एवढी दडपड सुरू असते, म्हणून सत्ताप्राप्ती ही ईश्वरप्राप्ती इतकी काही कठीण नाही. या नाठाळ जगात सत्तेची प्राप्ती अत्यंत सुलभ आहे. दारू पिणे जितके सोपे आहे, तितके ती पचविणे फार कठीण आहे. सत्ता मिलविणे जितके सोपे आहे, तितकेच ती टिकवणे फार कठीण हे. सत्तेच्या स्वयंवरात सरळमार्गी पापभीरूंची डाळ कधीच शिजत नाही. ही नवरी उलट्या काळजाच्या उमेदवारांवर बेहोष फिदा असते. परंतु तिने एखाद्याला माळ घातली म्हणजे ती त्या पुरुषाला कायमची काबूत ठेवता येईलच, असा मात्र भरवसा नाही. राजाला विष्णूचा अवतार मानण्याची कल्पना, वंशपरंपरेने राजसत्ता पुढे चालविण्याची वहिवाट, औरस नसला तर दत्तक घेण्याचा परिपाठ इत्यादि प्रकार सत्तेचा कैफ येनकेन प्रकारेण कसातरी कायम टिकवण्यासाठी कृत्रिम प्रकार होत. पण हे टिकाऊ नसतात हे इतिहासावरून आपणास खासे शिकता येते. सत्ताप्राप्तीसाठी तिच्या नथणीत अडकविण्याच्या गळाला शुद्ध लोकहिताचेच आमिष लावलेले असते. पार्लमेंटात, काँग्रेसमध्ये, कौन्सिलात किंवा मुन्सिपाल्टीत घुसणा-या उमेदवारांची जिव्हा निवडणुकीच्या वेळी साखरेलाही गोडीत जिंकते.
पण पुढे काय दिवे लागतात दिसतातच. गेल्या महायुद्धाच्या वेळी सुद्धा जर्मनांनी काय किंवा इंग्रजांनी काय, दोघांनीही याच आमिषाचा उपयोग करून झुकत्या दुनियेला झुकविली. रामराज्य येणार, आकाशातल्या बापाचे लेकाचे सत्ययुग सुरू होणार, गुलाम राष्ट्रे स्वतंत्र होणार, काय वाटेल ते होणार, असल्या जाहिराती फडकवून, युद्ध आचार्य विल्सन दीक्षितांनी बुद्धिसागराचे मंथन करून ५४ रत्ने बाहेर काढली. पण अखेर काय झाले? जर्मनीची क्षात्रवृत्ती व अमेरिकनांची मध्यस्थी यांना इंग्रजांच्या धोरणी डावपेचाच्या प्रवृत्तीने उलटी टांग मारून बोलबोलता चीत केले आणि युद्धदीक्षित विल्सन भटजी चवदाव्या रत्नाची खिरापत खात चतुर्थाश्रमात प्रविष्ट झाले. हातची सत्ता टिकवावी कशी याची गुरुकिल्ली आजकाल फक्त इंग्रजापाशीच आहे.
सत्तेचा परिणाम सत्ताधीनांवर बरा होवो की वाईट होवो, सत्ता मिळविणे आणि ती बराच काळ टिकविणे, याला बुद्धीचे बळ तसेच असामान्य पाहिजे, यांत शंका नाही. शस्त्रांचे बळ कितीही प्रचंड असो, अस्त्रांची शक्ती केवढीही जाज्वल्य असो, कुशाग्र बुद्धिबळाच्या जोरावर त्या दोनही शक्तींना बसल्या बैठकीवरून कसे चीत करता येते, हे गेल्य महायुद्धात इंग्रजांनी सर्व जगाच्या निदर्शनास आणले आहे. ऐदी तत्त्वविवेचक आणि सत्तेच्या घरटात दळले जाणारे बुद्धिहीन गुलाम, या बुद्धिबळाचे पृथक्करण करून, `ते स्वार्थाने सडलेले आहे, त्यात माणुसकीचा नीचपणा ओतप्रोत भरला आहे,’ वगैरे गुलामी रडगाणी खुशाल रडोत; ज्यांना सत्ता टिकवायची असते, ते आपल्या बुद्धिबळाची तेजस्विता बरी किंवा वाईट, सुष्ट किंवा दुष्ट, परोपकारी किंवा जुलमी, वाटेल त्या रंगाची ठेवल्याशिवाय मुळीच राहणार नाहीत. मुळी सत्तेची उत्पत्ती जेथे स्वार्थाच्या पोटी, तेथे सत्ताधीशानंतर पाठीवर उडणार कोरडे जुलमाच्या ताठ वाखाचे आहेत किंवा लपंडावीचा राठ सालीचे आहेत, या प्रश्नांची किंमत काय? ज्याच्या हाती शिकार तो पारधी, हा सनातन सिद्धांतच आहे. मुत्सद्देगिरीच्या बॅग्नेटाच्या तोकाने ३३ कोटी लोकवस्तीच्या हिंदुस्थानाला वचकात ठेवणा-या विदेशी इंग्रजी सत्तेला नावे ठेवणा-यांच्या स्वदेशी सत्ताबाज पूर्वजांनी तरी हाच सिद्धांत पाळला होता ना? आज इंग्रजांनी बुद्धिबळाच्या डावात सा-या जगावर मात केली आहे. हा बुद्धीच्या वर्चस्वाचा प्रश्न आहे आणि कधीही कोठेही सूर्य न मावण्याइतका जगाचा भाग त्यांनी जर आपल्या बुटाच्या टाचेखाली दडपून धरला असेल, तर त्यांच्या बुद्धिबळाचा आक्रम करण्याची कसोशी करावयाची की नुसत्या शिवीगाळीवर आपल्या कमजोर बुद्धीचे समर्थन करावयाचे?
वरचढ बुद्धिमत्ता आणि हातात राजकीय सत्ता, या दोन गोष्टींचा संयोग झाला, की इतरेजनांना पादाक्रांत करून सत्ता टिकविण्यासाठी वाटेल त्या भल्याबु-या उपयांचा अवलंब करणे, हा मनुष्याचा स्वभावधर्मच आहे. त्याबद्दल कोणी कोणास हसण्याचे किंवा द्वेष करण्याचेकारण नाही. हा शर्यतीचा प्रश्न आहे आणि बुद्धिबळाच्या डग् ऑफ वॉरमध्ये विजयी होणारे खेळाडू पराजित प्रतिस्पर्ध्यांना वाटेल तसे दडपू लागले तर तेथे `आत्मवत् सर्व भूतेषु’ असल्या तत्त्वज्ञानाची वकिली राजकारणाच्या किंवा समाजकारणांच्या क्षेत्रात कोणीही विचारात घेत नसतो. मनगटात जोर असेल, बुद्धीचे तेज जाज्वल्य असेल, कर्तबगारीची धमक जिवंत असेल, डावपेच लढविण्याची प्रवृत्ती लवचीक असेल, त्याने जगज्जेतृत्वाची महत्वाकांक्षा खुशाल यशस्वी करून दाखवावी. या जगात मर्दाच्या मर्दुमकीला मरणाचीही आडकाठी नसते. अर्थात जबरदस्त जेत्यांच्या बुद्धिवर्चस्वाने हतवीर्य बनून गुलाम झालेल्यांना, आत्मविश्वासाची कसोशी करून आपापल्या बुद्धीची शक्ती प्रतिस्पर्ध्याच्या बुद्धीला चीत करण्याइतकी प्रखरतम बनविल्याशिवाय मोक्षाचा दुसरा मार्ग लाभणे शक्य नाही. अमेरिकेतल्या गुलाम निग्रोंच्या उन्नतीचा प्रश्न महात्मा बुकर टी. वॉशिंग्टन याने आपल्या समाजाच्या आत्मविकसनाने झटझट सोडवून दाखविला. सत्तेच्या साधनाने शिरजोर झालेल्या प्रतिस्पर्ध्यांचा निवळ द्वेष करण्यापेक्षा त्याच्या शिरजोरपणाच्या शक्तीचे पृथक्करण करून त्यातली उत्कृष्ट उत्कृष्ट तत्त्वे आत्मविकसनार्थ पचनी पाडण्याचा उपक्रम केला, तर कालवशात् गुलामांनाही स्वातंत्र्याची प्राप्ति होणे अशक्य नाही.
आपापल्या जातीच्या उन्नतीसाठी प्रत्येक जातीने खुशाल संघटित चळवळी कराव्या. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर सर्व जातींनी दोन विभागांत एकवटून खुशाल आपापल्या विशिष्ट संस्कृतीच्या आत्मविकसनाच्या भगीरथ खटपटी कराव्या. परंत या खटपटींच्या धोरणाची दृष्टी हिंदू समाजाच्या व हिंदुराष्ट्राच्या एकमुखी व एकजिशी पुनरुज्जीवनाकडे रोखली जाईल, परस्परांच्या भिन्नभिन्न प्रवृत्तींचा योग्य प्रमाणात विनिमय केला जाईल, तर पुण्यस्मरण शिवरायाच्या महाराष्ट्राच्या तंबो-याच्या विविध तारा आज ज्या भेसुरतान झाल्या आहेत, त्या एकतान होतील आणि ब्राह्मण व ब्राह्मणेतर या भेदाच्या निर्मूलनातून महाराष्ट्राच्या भाग्योदयाची किरणे फांकतील. असा सोन्याचा दिवस शिवरायाच्या पुण्यचरणाच्य प्रसादाने लवकरच उगवो
[प्रबोधन १६-१२-२२]
लेख २२
नाना शंकरशेट
गुदस्त साली वाक्पुष्पे वाहून नानांच्या पुण्यात्म्याचे यथामति पूजन करण्याचे भाग्य आम्हाला लाभले, यंदांच्या वर्षी त्यांच्या उज्वल स्मृतिचित्रावर विचारसुमनांची ओंजळ लेखनद्वारा वाहण्याचा सुयोग दैवज्ञ ब्रबोधिनीकारांनी आणून दिला आहे. त्यांच्या चरणांना आमचे वंदन असो. नानांच्या नानारंगी चारित्र्याचा जसजसा अधिक विचार होईल, तसतसे त्याचे वास्तविक उज्वल स्वरूप महाराष्ट्राच्या प्रचितीस येत जाईल. आजकाल पुढा-यांची व राष्ट्रेत्यांची गर्दीच गर्दी उडाली आहे. विचारक्रांतीने आचाराचेही रूप पालटले आहे. नव्या नव्या आश्चर्यकारक कल्पनांच्या वादळात आमच्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण जीवनाची नौका परिस्थितीच्या लाटांबरोबर वर खाली हेलकावे खात आहे. आजचा महाराष्ट्र स्वराज्याच्या आणि स्वातंत्र्याच्य केवढ्याही लांबलांब बाता झोकीत असला तरी हे खरे की ते बरे, अशा किंकर्तव्यमूढ स्थितीत परिस्थितीच्या पाशात तो बद्ध होऊन धडपडत आहे खास. तो आज परिस्थितीचा दास आहे. महाराष्ट्रातल्या भिन्न भिन्न समाजांच्या भिन्न भिन्न आकांक्षा स्वतःच्या निष्कलंक परंतु बिनतोड संवादी व्यक्तित्वात केंद्रीभूत करणारा आणि लोकमान्यतेच्या किचकट परीक्षेत सोळा आणे गुण मिळवून, राजमान्यतेच्या दिव्यांतही `बुराख’ न ठरणारा नेता आज राष्ट्राच्या धुरेवर एकहि दिसत नसल्यामुळे, नानांची आठवण अपरिहार्य आहे. नानाकालीन इतिहासाचा ओघ खटार-दांडीचा आणि चालू काळचा मामला मोटरदौडीचा असला, तरी त्यामुळे नानांनी बजाविलेल्या शास्ताशासितमान्य राष्ट्रकर्तव्याचा कस आजला अणुरेणूही हिणकस ठरत नाही, येथेच त्यांच्या चारित्र्याचे रहस्य रसिकाला पटणारे आहे. हे रहस्य दाखवून दिसणारे नव्हे, सांगून पटणारे नव्हे, किंवा लिहून व्यक्त करता येणारेहि नव्हे. ते ज्याने त्याने आत्मचिंतनानेच पारखून घ्यावे. सज्जन नागरिक, इभ्रतदार व्यापारी, सरकारचे धोरणी सल्लागार, जनतेचे अद्वैती प्रेमळ पुढारी, स्त्रीशिक्षणाचे धाडसी कैवारी, सुधारणेचे निर्भीड भोक्ते, जीर्ण-नवमतांच्या झगड्यातील निस्पृह व न्यायी मध्यस्थ, अशा नाना दृष्टींनी नानांचे नानापण, चवचाल लोकांच्या स्मृतीच्या बुळबुळीत उतरणीवरून जरी घसरलेले असले, तरी महाराष्ट्राच्या इतिहासाने ते जरतारी शेल्याच्या फर्दांत चिरंजीव राखलेले आहे.
नानांच्या वेळच्या परिस्थितीची ज्यांना योग्य कल्पना असेल, त्यांनाच नानांच्या अचाट कर्तबगारीचे खरे माहात्म्य पटेल. हिंदवी स्वराज्याचा अधःपात, महाराष्ट्राच्या क्षात्रतेजाचा निःपात आणि परकीय राजसत्तेच्या मोहक मायेने होऊ घातलेला आमच्या आत्मभावनेचा घात, अशा तिरपगड्या त्रांगड्यात महाराष्ट्र संमूढ झाला असताना, त्या पठ्ठ्याने परिस्थितीला तोंडबेडी चढवून बोलबोलता देशकालमानाच्या रिंगणावर फिरविली आणि `माझ्या महाराष्ट्रा, घाबरू नकोस. ही परिस्थिती अजिंक्य नाही. तुझा आत्मविश्वास कायम ठेवशील, तर याही परिस्थितीवर आरूढ होऊन अटकेपार मराठ्यांचा जरीपटका पुनश्च नाचविशील.’ अशी हाक मारून त्याला कर्तव्यतत्पर केले, त्या नाना शंकरशेटला, मुंबापुरीच्या नानांना, महाराष्ट्राच्या तत्कालीन धुरिणाला विसरण्याइतका आजचा तरुण महाराष्ट्र कृतघ्न कसा होईल बरे?
परिस्थिती वीरांची माता की वीर परिस्थितीचा पिता, हा एक प्रश्न नानांनी आपल्य उज्वल चरित्रांत स्पष्ट सोडविला आहे. वरवर पाहणारे असे म्हणतात की मुसलमानी गंडगिरी बेफाम बोकाळली म्हणून शिवाजी अवतरला आणि म्हणूनच संतमंडळींनी आपले भगवती टाळ जोरजोराने ठोकण्याचा धडाका सुरू केला. भिक्षुकांची भिक्षुकशाही ढुंगणाचे डोक्याला गुंडाळून बेताल नाचू लागली, म्हणून एकनाथस्वामी अवतरले. त्याच प्रमाणे मोंगलाईला पादाक्रांत करणारी मराठेशाही आंग्लाईने नेस्तनाबूद केली, म्हणून त्या क्रांतीचा साखळदंड उत्क्रांतीच्या नावाला बेमालूम अडकविण्यासाठी नाना शंकरशेट उत्पन्न झाले.
पण किंचित् विचारांती ही `थिअरी’ चूक आहे, असेच अखेर कबूल करणे भाग पडते. `पुरुष असे अर्थाचा दास’ हे सूत्र भीष्माचार्याने म्हटले, तरी अर्थाला लाथ मारून, आपले पौरुषत्व गुलाम न बनविता, स्वयंविहारी वायूप्रमाणे ते दाही दिशांस उधळविणारे मर्द जसे आजही आहेत, तसे खुद्द भीष्माचार्यांच्या नाकासमोरही होतेच की नाही? मग काय राहिली त्या सूत्राची किंमत? परिस्थितीचा कुसवा वीरप्रभू असता, तर हे जग गुलामांचा पांजरापोळ का बनते? परिस्थितीच्या पायात कुलंगी कुत्र्याप्रमाणे शेपटीचे गोंडे घोळायला मर्द वीर कधी तरी इच्छील काय? परिस्थितीच्या पायाचे आंगठे गुलामांनीच चुंबावे, ते मर्दाचे काम नव्हे. मर्द वीर बेशिस्त परिस्थितीला कर्तबगारीच्या हंटरचे तडाखे लगाऊन, सर्कशीतल्या खुनशी सिंहिणीप्रमाणे, शिस्तवार कसरत करायला लावतो. वेळी परिस्थिती तुफान होऊन गुरकाऊ लागली तरी खरा वीर आपले पुढे टाकलेले पाऊल रेसभरही मागे न घेता, कधी चुचकारून तर कधी दरडावून, तिला ठरलेल्य कसरतीची गोलांटी उडी मारायला लावतोच लावतो; पण तिच्या नजरेला भिडलेली नजर लवमात्रही नरमवणार नाही. नानावर राज्यक्रांतीच्या धामधुमीत राजकीय बालंटांची भयंकर संक्रांत खवळली होती; पण त्यावेळचे त्यांचे सौजन्य आणि त्यांचा सत्याग्रही बाणा पाहिला, की परिस्थितीला वीर प्रसू समजणा-यांची कीव केल्याशिवाय कोण राहील? मराठेशाहीच्या जागी अंग्रेजशाही, बाजीरावीच्या ठिकाणी अल्पिष्टणी, अहम् वयम्च्या ऐवजी यस फ्यस; केवढा भयंकर परिस्थितीचा ट्रान्स्फर सीन! पण त्यातूनही नानांनी आपल्या अद्वितीय बुद्धिबलाने अक उमेदवार प्याद्यांचे फर्जी करून, शहाणपणाची मिजास मारणा-या अंग्रेज बहादुरांना महाराष्ट्राच्या बुद्धिमतेचे पाणी पाजून गार बसवले!
लेख २३
हिंदवी स्वराज्याचा खून
[ता. २९ एप्रिल १९२२ रोजी सातारा येथे श्रीशिवजयंत्युत्सव प्रसंगी श्री. ठाकरे यांनी दिलेले व्याख्यान]
भगिनीबांधवहो, आज पण पुण्यश्लोक श्रीशिवाजी महाराज यांचा जन्मदिवस साजरा करण्याकरिता जमलो आहो. आजचा दिवस अत्यंत मंगल, अत्यंत पवित्र आणि स्फूर्तिदायक असा आहे. या दिवशी गुलाम महाराष्ट्राला स्वतंत्र करणारा, नामर्द मराठ्यांना मर्द बनविणारा आणि नांगरहाक्या अनाडी शेतक-यांतून भीष्मार्जुनकर्णापेक्षाही सवाई भीष्मार्जुन निर्माण करणारा राष्ट्रवीर जन्माला आला. अर्थात असा मंगल प्रसंगी `शिवरायास आठवावे’ या विषयानुरुप शिवचरित्राबद्दल मी काही विवेचन करावे, अशी आपली अपेक्षा असणे साहजिक आहे व तसा माझाही उद्देश होता. परंतु पाडळीला मोटारीत बसून मी साता-याकडे येऊ लागताच माझा तो बेत बदलला. शिवरायास आठवता आठवता सबंध शिवशाहीचा चित्रपट माझ्या अंतचक्षुसमोर भराभर फिरू लागला; आणि सातारच्या या निमकहराम स्वराज्य द्रोही राजधानीत मी येऊन दाखल होताच, शिवाजीने स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अंतकाळचा भेसूर देखावा मला स्पष्ट दिसू लागला. बांधवहो, आपण सातारकर असल्यामुळे आपल्याला साता-याचा अभिमान असणे योग्य आहे. क्षमा करा, मला तितका त्याचा अभिमान नाही. सातारा ही पापभूमी आहे. सातारा ही हिंदवी स्वराज्याची –हासभूमी आहे. रायगडावर उदय पावलेल्या हिंदवी स्वराज्याचा सूर्य या साता-यास अस्त पावला. रायगडाला जन्माला आलेल्या स्वराज्याच्या नरडीला नख देऊन भिक्षुकशाहीने या साता-यास त्या स्वराज्याचा मुडदा पाडला. दिल्लीच्या मोंगल बादशाहीच्या सिंहासनाला गदगदा हलवणारा, इतकेच नव्हे, तर अटकेपार रूमशामच्या बादशाही तक्ताचा थरकाप उडविणा-या हिंदवी स्वराज्याचे रक्त या साता-याच्या पापभूमीवर सांडलेले आहे. शिवछत्रपतीच्या विश्वव्यापी मनोरथाचा ज्या भूमीत नायनाट झाला, त्याच भूमीवर उभे राहून आजच्या मंगल प्रसंगी पुण्यश्लोक शिवरायाचे गुणगायन करण्यापेक्षा, आमचे हिंदवीस्वराज्य का नष्ट झाले, त्याच्या गळ्याला कोणकोणत्या अधमांनी नख लावले आणि भिक्षुकशाहीने कोणकोणती घाणेरडी कारस्थाने करून आमच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचा मुडदा या साता-यात पाडला, त्याचा आज जर आपण इतिहासाच्या आधाराने विचार केला, तर सध्याच्या स्वराज्योन्मुख अवस्थेत आपल्याला आपल्या कर्तव्याची पावले नीट जपून टाकिता येतील. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असली तात्त्विक पुराणे सांगणारे टिळकानुटिळक आज पैशाला खंडीभर झाले आहेत. परंतु त्याच जन्मसिद्ध हक्कावर रखरखीत निखारे ठेवण्यास ज्या हरामखोरांची मनोदेवता महाराष्ट्रद्रोहाचा व्यभिचार करण्याचे कामी किंचितसुद्धा शरमली नाही, त्यांचा खराखुरा इतिहास उजेडात आणणारे मात्र आपल्याला मुळीच भेटणार नाहीत. आज स्वराज्य शब्दाचे पीक मनमुराद आलेले आहे. फंडगुंडांच्या पोतड्या भरण्यासाठी स्वराज्य हा एक ठगांचा मंत्र होऊन बसला आहे. परंतु स्वराज्य म्हणजे काय याची व्याख्या मात्र कोणीच स्पष्ट करीत नाही. अशा प्रसंगी आपले हिंदवी स्वराज्य आपण का गमावले, याचा नीट विचार केल्याससध्या महाराष्ट्रभर धुमाकूळ घालीत असलेल्या राष्ट्रीय गुंडांच्या स्वराज्यविषयक चळवळीत ब्राह्मणेतर संघाने किती जपून वागले पाहिजे याचा खुलासा तेव्हाच होईल. राष्ट्रीयांची स्वराज्य-पुराणे म्हणजे गांवभवानीची पातिव्रत्यावरील व्याख्याने आहेत; कारस्थानी वेदांत आहे; ठगांची ठगी आहे; स्वार्थसाधूंचा मायाजाल आहे. शिवरायास आठवावे; गोष्ट खरी! परंतु आज शिवछत्रपतींचे स्मरण होताच त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या -हासाचे पृथक्करण करम्याकडे आपली स्मरणशक्ती वळते, त्याला इलाज काय?
तेव्हा आपण आता छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या कारकीर्दीकडे वळू. प्रतापसिंह हे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीचे करवीरकर शाहू छत्रपती होते. १८१८ साली रावबाजीचे व त्याबरोबर पुण्यातल्या पेशवाईचे उच्चाटण पापस्मरण बाळाजीपंत नातूंनी केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने प्रतापसिंह महाराजांना त्यांच्या पूर्वजांच्या सिंहासनावर स्थापन केले. यापूर्वी याच अजिंक्यता-याच्या किल्ल्यावर प्रतापसिंह महाराजांना निमकहराम कृतघ्न पेशव्यंनी सहकुटुंब सहपरिवार अनेक वर्षे कैदेत ठेवलेले होते.
सिंहासनाधिष्ठित होताच, महाराजांनी राजकारणाची यंत्ररचना ठाकठीक बसविल्यानंतर, ब्राह्मणेतरांच्या सामाजिक व धार्मिक उन्नतीचा प्रश्न हाती घेतला. थोडक्यात सांगायचे म्हणजे ब्राह्मणेतरांच्या उन्नतीचा जो प्रश्न करवीरकर छत्रपतींनी सध्या हाती घेतलेला आहे, तोच प्रश्न प्रतापसिंह महाराजांनी हाती घेऊन दीनदुनियेला ब्राह्मणांच्या कारस्थानी भिक्षुकशाही बंडापासून मुक्त करण्याचा विडा उचलला. ब्राह्मणेतरांच्या अज्ञानावर मनमुराद चरण्यास सोकावलेल्या पेशव्यांच्या अभिमानी भिक्षुकांना महाराजांची ही चळवळ कशी बरे सहन होणार? ती हाणून पाडण्यासाठी भिक्षुकशाहीने कमरा कसल्या. त्यावेळी या कंपूचे पुढारपण स्वीकारण्यासाठी पुढे झालेले त्यावेळचे `लोकमान्य’ म्हटले म्हणजे पापस्मरण बाळाजीपंत नातू हे होत. इंग्रजांकडून मिळणा-या जहागिरीच्या लचक्याला लालचटलेल्या ज्या अधमाने स्वजातिवर्चस्वाच्या शनवारवाड्यावर इंग्रजांचा बावटा फडकवायला मागेपुढे पाहिले नाही तो चांडाळ, छत्रपतीच्या ब्राह्मणेतर संघाला उन्नतीचा एक श्वास देखील कसा घेऊ देईल?
असले हे लोकमान्य नातू शेंडी झटकून पुढे सरसावताच त्यांच्या पाठीमागे चिंतामणराव सांगलीकर, बाळाजी काशी किबे, बाळंभट जोशी, बाळकोबा केळकर, नागो देवराव, भोरचे पंत सचिव, कृष्णाजी सदाशिव भिडे, सखाराम बल्लाळ हाजनी, महादेव सप्रे, भाऊ लेले, (एक मावळा – अर इचिभन! हत बी भाऊ लेल्या?) असेल हे अस्सल ब्राह्मण वीर प्रतापसिंह छत्रपतीची चळवळ आमूलाग्र उखडून टाकण्यासाठी कमरा कसून सिद्ध झाले. परंतु ही सर्व सेना जातीची पडली ब्राह्मण, एकरकमी चित्पावन, अस्सल राष्ट्रीय. तेव्हा आपल्या पक्षाला `सार्वजनिकत्व’ आणण्यासाठी बाळाजीपंतांना एखाद्या फुल्याची गुंजाळाची किंवा औट्याची फारच जरूर भासू लागली. लवकरच परशुरामाच्या कृपेने बाळाजीपंतांच्या या राष्ट्रीय चळवळीत एक बिनमोल ब्राह्मणेतर प्यादे हस्तगत झाले. ते कोणते म्हणाल, तर खुद्द प्रतापसिंहांचे धाकटे भाऊ आप्पासाहेब भोसले. खुद्द राजघराण्यातलाच असला अस्सल मोहरा राष्ट्रीय चित्पावनी मंत्राच्या जाळ्यात सापडताच नातूच्या राष्ट्रीय कटाला सार्वजनिकपणाचे स्वरूप तेव्हाच आले आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या बगलेत शिरून या राष्ट्री नातूकंपूने इंग्रजांच्या हातून छत्रपतीच्या सिंहासनाचे परस्पर पावणेतेरा करण्याची आपली कारवाई सुरू केली. या कामी त्यानी एकदोन शंकराचार्यसुद्धा बगलेत मारले. नातूंनी विचार केला, की हा मरगट्टा छत्रपति ब्राह्मणेतरात धार्मिक आणि सामाजिक जागृती करून आम्हा भूदेवांचे वर्चस्व कढीपेक्षाही पातळ करणार काय? थांब लेका! तुझ्या सिंहासनाच्या खालीच माझ्या चित्पावनी कारस्थानाचा बांब गोळा ठेवून, कंपनी सरकारच्या हातूनच त्याचा स्फोट करवितो, मग पहातो तुझ्या ब्राह्मणेतरांच्या उन्नतीच्या गप्पा! बांधवहो, कोल्हापुरच्या श्रीशाहू छत्रपतींना `स्वराज्यद्रोही’ ठरविण्याची केसरीकारांची राष्ट्रीय चतुराई आणि प्रतापसिंहाला गुप्त कटाच्या फासात अडकवून जिवंत गाडण्याची नातुशाही या दोन्ही गोष्टींचा मसाला एकाच राष्ट्रीय गिरणीचा आहे, इतके आपण लक्षात ठेवले म्हणजे झाले. नातूकंपूत सामील झालेल्या या सर्व पंचरंगी राष्ट्रीयांनी कंपनीसरकारच्या गव्हर्नरापासून तो थेट सातारच्या रेसिडेंटापर्यंतच्या सर्व पात्रांच्या नाकात आपल्या कारस्थानाची वेसण `खूप शर्तीने’ घातली. अर्थात् सर जेम्स कारनाकपासून तो थेट रेसिंडेट कर्नल ओव्हान्सपर्यंत सगळी बाहुली लोकमान्य नातूंच्या सूत्राच्या हालचालीप्रमाणे `लेफ्ट राइट’ `लेफ्ट राइट’ करू लागली. या पुढचा इतिहास अत्यंत भयंकर आणि मानवी अंतःकरणास जाळून टाकण्यासारखा आहे.
पंरतु तो प्रत्यक्ष घडवीत असताना मात्र बाळाजीपंत नातू किंवा चिंतामणराव सांगलीकर यापैकी एकाचेही अंतःकरण चुकूनसुद्धा कधी द्रवले नाही. राष्ट्रीय अंतःकरण म्हणतात ते हे असे असते. अनुयायांची गोष्ट काय विचारावी? जेथे खुद्द आप्पासाहेब भोसले, राज्यलोभाने सख्या भावाच्या गळ्यावर सुरी फिरविण्यास सिद्ध झाला, तेथे आपल्य सद्सद्विवेक बुद्धीची मुंडी पिरगळताना इतरांना कशाची भीती? प्रतापसिंह महाराजांनी भिक्षुकशाहीचे बंड मोडून ब्राह्मणेतरांना धार्मिक व सामाजिक स्वातंत्र्य देण्याची चळवळ हाती घेताच, बाळाजीपंत नातूच्या उपरण्याखाली जे राष्ट्रीय कुत्र्यांचे सार्वजनिक मंडळ जमा झाले, त्याला एवढीही कल्पना भासू नये काय, की आपल्या या उलट्या काळजाच्या कारस्थानामुळे श्रीशिवछत्रपतीच्या हिंदवी स्वराज्याचे सिंहासन आपण जाळून पोळून खाक करीत आहोत? महाराष्ट्राच्या मानेवर सुरी फिरवीत आहोत? जाणूनबुजून क्षुल्लक स्वार्थासाठी फिरंगी आपल्या घरात घुसवीत आहोत? आजला त्याच हरामखोर नातूचे सांप्रदायिक जातभाई करवीरकर छत्रपतींना `स्वराज्यद्रोही छत्रपति’ म्हणून शिव्या देण्यास शरमत नाहीत. या वरून एवढेच सिद्ध होते की, बाळाजीपंत नातूचा स्वराज्यद्रोही संप्रदाय अजून महाराष्ट्रात जिवंत आहे. आम्हाला जर स्वराज्य मिळवावयाचेच असेल, आमचे उद्याचे स्वराज्य चिरंजीव व्हावे अशी जर तुमची इच्छा असेल, तर प्रतापसिंहाच्या वेळी भिक्षुकशाहीने या साता-यात रायगडच्या स्वराज्याचा जसा मुडदा पाडला, तसाच उद्याच स्वराज्य मिळविण्यापूर्वी महाराष्ट्रांत शिल्लक उरलेल्या स्वराज्यद्रोही नातू संप्रदायाचा आपणास प्रथम बीमोड केला पाहिजे. नव्हे, असे केल्याशिवाय तुम्हांला स्वराज्यच मिळणे शक्य नाही. बाळाजीपंत नातूचे चरित्र भ्रूणहत्या, स्त्रीहत्या, गोहत्या, राजहत्या, स्वराज्यहत्या, आणि सत्यहत्या असल्या कल्पनातीत महापातकांनी नुसते बरबटलेले आहे. अर्थात जोपर्यंत हा नातू, किबे केळकर अँड को. चा संप्रदाय महाराष्ट्रातून हद्दपार होणार नाही, तोपर्यंत आपल्याला खरेखुरे स्वराज्य लाभणार नाही. या संप्रदायाच्या स्वराज्यद्रोही लीला जर नीट विचारात घेतल्या नाहीत, तर तुमच्या पदरात पडणारे स्वराज्य म्हणजे ब्राह्मणभोजनातल्या खरकट्या पत्रावळी हे खूब ध्यानात ठेवा.
छत्रपति प्रतापसिंहाने ब्राह्मणेतरांची सुरू केलेली चळवळ हाणून पाडण्यासाठी खुद्द त्यालाच पदभ्रष्ट करून मुळातलाच काटा उपटण्याची बाळाजीपंत नातूच्या राष्ट्रीय कंपूची जी तयारी झाली, तिकडे आपण आता वळू. हरप्रयत्नाने घरभेद करून फोडलेल्या अप्पासाहेब भोसल्याला ता. २४ मार्च १८३९ रोजी नातूने रेसिदंट ओवन्सच्या चरणांवर नेऊन घातले व त्याच्या झेंड्याखाली सर्व स्वराज्यद्रोही गुप्तकटवाल्यांची मर्कटसेना भराभर जमा केली. कंपनी सरकारच्या गव्हर्नरापर्यंत सर्वांना प्रतापसिंहाविरुद्ध चिथावून देऊन, हा राजा इंग्रजांचे राज्य उलथून पाडण्याचा गुप्त कट करीत आहे, आम्ही सर्व पुरावा आपल्याला देतो, माबाप कंपनी सरकारची आम्हाला पूर्ण मदत असावी, असा मंत्र फुंकून रेसिदंट ओवन्सला नातू कंपूने आपले तोंड बनविले. राजकीय बाब ओवन्सच्या मार्फत अशी पेटवून दिली, तो इकडे (अ) धर्ममार्तंड चिंतामणराव सांगलीकर यांनी वेदोक्त पुराणोक्त तंटा उपस्थित करून छत्रपतीच्या विरुद्ध, कंपनी सरकारकडे धार्मिक जुलमाबद्दल फिर्यादीच्या अर्जाची भेंडोळी रवाना करण्यासाठी आपली ब्राह्मणसेना जय्यत उभी केली. आज ज्याप्रमाणे ब्राह्मणेतरांविरुद्ध व विशेषतः सत्यशोधकांविरुद्ध अत्याचारांच्या खोट्यानाट्या फिर्यादीची दंगल उडालेली हे, त्याचप्रमाणे चिंतामणरावांच्या ब्राह्मणसैन्याने आपला शंखध्वनीचा संप्रदाय मोठ्या नेटाने चालू केला. हे राष्ट्रीय ब्राह्मण नुसत्या कागदी अर्जाच्या कारस्थानावरच अवलंबून बसले नाहीत. निरनिराळ्या वेळी कंपनी सरकारच्या मोठमोठ्या अधिका-यांच्या छावण्यांपुढे हजारो ब्राह्मणांनी जमून जाऊन प्रतापसिंहाच्या विरुद्ध धार्मिक व सामाजिक अत्याचारांची अकांडतांडवपूर्वक कोल्हेकुई करण्याची सुरुवात केली. चिंतामणरावाने तर नातूचे व्याही कुप्रसिद्ध नीळकंठ शास्त्री थत्ते यांच्या अर्ध्वयुत्वाखाली ब्राह्मणेतरांना, विशेषतः मराठ्यांना व कायस्थ प्रभूंना `शूद्राधम चांडाळ’ ठरविणारे (अ)धार्मिक ग्रंथ लिहून प्रसिद्ध करण्याची एक मोठी गिरणीच सांगलीला काढली.
छत्रपतीकडून होणा-या ब्राह्मणांवरील अत्याचारांच्या बनावट हकीकती जिकडे तिकडे बेसुमार पसरविण्याच्यe कामगिरीने त्यावेळच्या ब्राह्मण स्वयंसेवकांनी अद्भूत `राष्ट्रीय’ कामगिरी बजावली. विशेष चीड येण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्याशिवाजी महाराजांनी या कृतघ्न ब्राह्मणांच्या बापजाद्यांची जानवेशेंडी रक्षण केली, त्याच शिवाजीचा अस्सल वंशज प्रतापसिंह छत्रपति हा `हिंदूच नव्हे, हा हिंदु धर्माचा वैरी आहे,‘ अशा अर्थाचे मोठमोठे जाहीरनामे चिंतामणराव सांगलीकराने शहरोशहरी व खेडोखेडी सर्व हिंदुस्थानभर फडकविण्यात बिलकूल कमतरता केली नाही! इतके झाले तरी नातूकंपूच्या मार्गात एक मोठा काटा अजून शिल्लकच होता, आणि तो मात्र कसल्याही लाचलुचपतीला बळी न पडण्याइतका भक्कम व सडेतोड होता. तो कोण म्हणाल, तर ज्याला आद्य छत्रपति शिवाजी महाराज `बाळाजी माझा प्राण आहे’ असे म्हणत असत, त्या बाळप्रभू चिटणिसाचा अस्सल वंशज बळवंतराव मल्हार चिटणीस हा होय. बळवंतराव जर आपल्या चिटणीशीवर चुकूनमाकून कायम राहता, तर त्याच्या चिटणीशी लेखणीच्या घोड्यांनी नातूकंपूच्या घरादारांवर गाढवांचे नांगर फिरविले असते! परंतु चित्पावनी काव्याची पोच जबरदस्त! बळवंतरावांचा पराक्रम नातू जाणून होता. चिटणीस कायम असेपर्यंत छत्रपतीचा रोमही वाकडा होणार नाही, ही त्याची पुरी खात्री होती. चिटणीशी लेखणीपुढे परशुरामाच्या वरप्रसादाची पुण्याई वांझोटी ठरणार हा अनुभव त्याच्या डोळ्यांपुढे होता. म्हणून हा चिटणीशी कांटा उपटण्यासाठी नातूने कर्नल ओवन्सकडून बळवंतराव चिटणिसाला एकाकी अचानक पकडून बिनचौकशीचे पुण्याच्या तुरुंगात फेकून दिले. बिनचौकशीने अटक करण्याच्या ब्रिटिश नोकरशाहीच्या पद्धतीविरुद्ध `अन्याय’ `अन्याय’ म्हणून कोलाहल करणा-या राष्ट्रीयांनी आपल्या संप्रदायाच्या पूर्वजांचे हे हलकट कृत्य विचारात घेण्यासारखे आहे.
चिटणीसाचा काटा अशा रीतीने उपटल्यावर नातूचा मार्ग बिनधोक झाला. छत्रपतीच्या राजवाड्यातील अनेक प्रामाणिक नोकरांना पकडून, लाच देऊन, मारहाण करून नानाप्रकारचे खोटे दस्तऐवज पुरावे तयार केले, व रेसिडेंटापुढे खोट्या जबान्या देवविल्या. काही नातूच्या कारस्थानास बळी पडले व काही स्वामिनिष्ठेला स्मरून आनंदाने तुरुंगात खितपत पडले. बाळकोबा केळकर या कुबुद्धिमान गृहस्थाने बनावट सह्या शिक्के बनविण्याचे राष्ट्रीय कार्य हाती घेतले. प्रतापसिंह छत्रपति हा ब्राह्मणांचा भयंकर छळ करतो, या नाटकाची उठावणी चिंतामणरावाने आपलेकडे घेतली होती आणि या कामी त्यांनी शंकराचार्याच्या नरडीवरसुद्धा गुडघा देऊन खोटी आज्ञापत्रे बळजबरीने लिहून घेण्यास कमी केले नाही. राजकारणाच्या बाबतीत छत्रपतीच्या गळ्यात कंपनीसरकारविरुद्ध गुप्तकटाची राजद्रोहाची घोरपड लटकविण्याचे पुण्य कार्य मात्र खुद्द महात्मा नातूनी आपल्या हाती ठेवले होते. या कामी बनावट राजद्रोही पत्रे, खलिते, अर्ज्या या निर्माण करण्याच्या कामी हैबतराव व आत्माराम लक्ष्मण उर्फ अप्पा शिंदकर या दोघा ब्राह्मणेतर पात्रांना हाती धरून बाळाजी काशी किबे आपल्या कल्पनकतेची कसोशी करीत होता. अखेर नातू कंपूचे सर्व कारस्थान शिजून तयार झाले. गोव्याच्या पोर्जुगीज सरकारकडे प्रतापसिंहाने गुप्त संधान बांधून त्यांच्या मदतीने इंग्रजांना हुसकून देण्याच्य बनावट कटाबद्दल कंपनी सरकारच्या गव्हर्नराची `वेदोक्त’ खात्री पटली. ब्राह्मणांच्या छळाविषयी कंपनीसरकारने जरी कानावर हात ठेविले – कारण धार्मिक, सामाजिक बाबतीत तोंड न बुचकळण्याचा त्यांचा निश्चय जगजाहीरच – तरी पण छत्रपतीविरुद्ध स्वराज्यद्रोहाचा आरोप बळकट करण्याच्या कामी चिंतामणरावांचा राष्ट्रीय शंखध्वनी अगदीच काही फुकट गेला नाही. प्रतापसिंहास या सर्व गोष्टी कळत नव्हत्या, अशातली गोष्ट नव्हती. परंतु त्या वेळी घरभेदेपणा अतोनात माजल्यामुळे, आणि नातूच्या राष्ट्रीय पक्षाकडूनफंदफितुरीचा भयंकर सुळसुळाट झाल्यामुळे महाराजांच्या आत्मविश्वाने कच खाल्यास त्यात नवल ते काय? तथापि, काय वाटेल ते होवो आपण जर कोणाचे वाईट करीत नाही, सत्य मार्गाने जात आहोत आणि कंपनी सरकारशी कोणत्याही प्रकारे दुजाभावाने वागत नाही, तर माझे कोण काय वाकडे करणार? अशा प्रामाणिक समजुतीवर महाराजांनी नातुकंपूच्या वावटळीस तोंड देण्याचा निश्चय केला. चिटणिसाची अचानक उचलबांगडी झाल्यामुळे त्यांचा धीर बराच खचला. सरतेशेवटी दैवावर हवाला ठेवून सत्यासाठी येतील ती संकटे निमूटपणे सहन करण्याचे त्यांनी ठरविले.
ता २२ ऑगस्ट १८३९ रोजी मुंबईचे गव्हरनर सर जेम्स कारनॅक आपल्या लवाजम्यानिशी नातूकंपूने शिजवून ठेवलेली गुप्त कटाची हांडी फोडण्यासाठी साता-यास येऊन दाखल झाले. महाराजांना निमंत्रण जाताच दुपारी तीन वाजता ते त्यांच्या भेटीस गेले. त्यावेळी त्यांचे झालेले संभाषण सारांशाने असे होते. –
सर जेम्स :- तुम्ही आमच्या विरुद्ध गुप्त कट चालविलेला आहे, आणि त्याचा सर्व पुरावा माझ्यापाशी आहे.
महाराज :- काय? आपल्याविरुद्ध मी गुप्त कट केला आहे? अगदी बनावट गोष्ट! आपण या बाबतीत वाटेल तर माझी उघड चौकशी खुशाल करावी.
सर जेम्स :- त्यात काय चौकशी करायची. ख-या गोष्टी मला सर्व माहीत आहेत. याउपर चौकशीची यातायात करण्याची आम्हाला जरूर नाही. आता आपल्या एकच मार्ग मोकळा आहे, आणि तो हाच की, मी सांगतो या जबानीपत्रकावर आपण मुकाट्याने सही करावी. घासाघीस करायला मला वेळ नाही.
महाराज :- आपल्याला वेळ नसेल तर मी सर्व कागदपत्र ओव्हन्स साहेबाला दाखवून त्यांची खात्री पटवून देईन. माझ्यावरील किटाळाचा समतोल बुद्धीने उघड न्याय व्हावा हीच माझी इच्छा आहे. कंपनी सरकारशी दुजाभावाने मी कधीही वागलो नाही. इंग्रज सरकारच्या मैत्रीसाठी मी विहिरात उडी घ्यायलाही कमी करणार नाही. परंतु माझ्या कल्पनेतही कधी न आलेल्या ज्या घाणेरड्या गोष्टी केल्याचा आरोप माझ्यावर आलेला आहे, त्याबद्दल माझा प्राण गेला तरी मी कबुलीजबाब देणार नाही. सत्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर!
सर जेम्स :- महाराज, मी काय म्हणतो ते मुकाट्याने करा. त्यात तुमचा फायदा आहे. नाहीतर तुमचे राज्य राहणार नाही हे लक्षात ठेवा.
महाराज :- मी राज्याची कधीच अपेक्षा केलेली नाही. इंग्रज सरकारच्या दोस्तीचा मात्र मी चाहता आहे. परंतु बिनचौकशीने घाणेरडे बनावट आरोप कबूल करून या राज्यावर राहण्याची माझी मुळीच इच्छा नाही. तुमची इच्छा असेल, तर माझे राज्याधिकार आताच घ्या, मी खुशाल भीक मागून आपले पोट भरीन. माझ्या चिटणिसाप्रमाणे मला उचलून तुरुंगात टाकावयाचे असेल, तर खुशाल टाका. तुमच्या संत्रीच्या देखरेखीखाली मी भिक्षा मागून राहीन, आता मी आपल्या बंगल्यावरच आहे. मी येथून घरी परतच जात नाही, म्हणजे झाले!
सर जेम्स :- असे करू नका. मी सांगतो याप्रमाणे या कागदावर मुकाट्याने सही करून मोकळे व्हा. नाहीतर मला निराळीच तजवीज करावी लागेल,
महाराज :- तुम्हाला काय वाटेल ती तजवीज करा. ज्या गोष्टी मी केल्या नाहीत, त्या केल्या म्हणून आपल्याला लेखी जबानी देऊ काय? ही गोष्ट प्राणांतीही होणार नाही.
प्रतापसिंह महाराजांच्या या सत्यप्रिय आणि बाणेदार वर्तनाचे स्पष्टीकरण करताना त्यावेळी पार्लमेंटपुढे व्याख्यान देताना मेजर जनरल रॉबर्टसननी जे उद्गार काढले तेच मी आपणास सांगतो. ते म्हणाले,
The conduct of the Raja of Satara would do honour to the best days of ancient Rome, and is, in my opinion, in itselt a sufficient refutation of all that has been urged against him.
(भावार्थ – प्राचीन रोमन साम्राज्याचा नैतिक सुवर्णयुगाला साजेशोभेसे वर्तन महाराजांनी केले व त्यांच्या सत्याग्रही तडफीतच त्यांच्याविरुद्ध रचलेल्या बनावट किटाळांचा फोलकटपणा सिद्ध होत आहे.) महाराजांविषयी भिक्षुकशाहीच्या ज्वलज्जहाल द्वेषाची परिस्फुटता करताना रॉबर्टसननी काढलेले उद्गार चालू घटकेलासुद्धा विचार करण्यासारखे आहेत. राष्ट्रीय गुंडांच्या स्वराज्यपुराणांच्या चालू धामधुमीत ते उद्गार तुम्ही नीट मनन करा.
The Rajah had many reekless and influential enemies, and particulary that he had incurred the enmity of the Brahmins, and as it was on religious grounds that their enmity was founded, their hostility partook of all that deadly hatred which is so often mixed up in polemical disputes. I may add also, that there are no persons so unscrupulous as Brahmins when they have a Brahmanical object to carry. Everything which is likely to promote their views, however unprincipled, is then resorted to, for they think that, in such a cause the end hollows the means…… I believe among his many enemies, His Highness considers the Brahmin tribe as the nost numerous, virulent and influential. I may state that, upon political grounds, there exists mush jealousy and ill will on the part of that race to his Highness, merely because his restoration to the possession of that small share of power and importance which he now enjoys, results from the political overthrow of the Brahmin power.
(भावार्थ – राजाचे आणि ब्राह्मण लोकांचे भयंकर हाडवैर होते. विशेषतः त्याचे मूळ धर्मविषयक तंट्यांत असल्यामुळे तर भिक्षुकशाही त्याच्यावर जळजळीत आग पाखडीत असे. मी असे स्पष्ट म्हणतो की, या भटांना एकादी भटी कावा साधायचा असला म्हणजे ते काय काय अत्याचार व भानगडी करतील याचा नेमच नाही. त्यांचे बेत साधण्यासाठी करू नये त्या गोष्टीसुद्धा करायला ते मागेपुढे पाहत नाहीत; कारण त्यांना पक्के माहित असते की हेतू साध्य झाला की साधनांच्या बरेवाईटपणाची चौकशी होते कसली?...... राजाच्या दुष्मानांत ब्राह्मणांचा नंबर अगदी पहिला. शिवाय ते बरेच असून जितके ते राक्षसी व दुष्ट आहेत. तितकेच वजनदारही आहेत. राजकारणाच्या बाबतीतसुद्धा ब्राह्मणांचा द्वेष कमी भयंकर नाही. त्या दृष्टीने तर ब्राह्मण लोकांच्या डोळ्यात तो रात्रंदिवस सलत असतो. याचे कारण काय, तर पेशव्यांची ब्राह्मणी राज्यसत्ता नष्ट झाली व या राजाची थोडीबहुत राज्यसत्ता जिवंत राहिली, हेच) सन १८४० सालचे हे उद्गार चालू घटकेलासुद्धा पुण्याची राष्ट्रीय भिक्षुकशाही व कोल्हापूरचे श्री शाहू छत्रपति यांच्या झगड्यात किती सापेक्ष रीतीने सिद्ध होत आहेत, याचा आपणच नीट विचार करा.या हिंदुस्थानात मराठ्यांचे किंवा एखाद्य ब्राह्मणेतरांचे एकही राज्य कोठे शिल्लक राहू नये, जिकडे तिकडे सारी भटभिक्षुकशाही माजावी, ब्राह्मणेतरांवर ब्राह्मणांची सनातन कुरघोडी असावी, यासाठी या राष्ट्रीय गुंडांची केवढी धडपड चाललेली असते, हे जर आपण जरा लक्षपूर्वक विचारत घ्याल, तर राष्ट्रीयांच्या स्वराज्याच्या गप्पा म्हणजे ब्राह्मणभोजनाच्या खरकट्या पत्रावळी असे जे मी म्हणतो, त्याचा तुम्हाला तेव्हाच उलगडा होईल.
तागडीच्या जोरावर सबंध हिंदुस्थानभर तंगड्या पसरणा-या कंपनी सरकारालासुद्धा छत्रपतीसारखा पाणीदार राजा व त्याचे संस्थान शिल्लक ठेवणे जिवावरच आले होते. तशात स्वदेशातलेच ब्राह्मण लोक जर एकमुखाने स्वदेशी राजाला जिवंत गाडण्याची चळवळ करीत आहेत, तर त्या चळवळीचा फायदा घेऊन परस्पर पावणे तेरा या न्यायाने नातूकंपूने शिजविलेल्या बनावट राजद्रोहाच्या हांडीने छत्रपतीचा कपाळमोक्ष होत असल्यास कंपनी सरकारला ते हवेच होते. म्हणजे आपला स्वार्थ साधण्यासाठी नातू कंपूने कंपनी सरकारला व कंपनी सरकारने नातकंपूला परस्पर मिठ्या मारण्यात व्यभिचारी राजकारणाचे बेमालूम डावपेच दोघेही खेळले, हाच इतिहासाचा पुरावा आहे. असो. कंपनीसरकार आपले काही ऐकत नाही, न्यायाचा प्रश्नसुद्धा ते विचारात घेत नाही, उलट हरामखोर ब्राह्मणांच्या पूर्ण पचनी पडून पदभ्रष्ट करण्याच्या धमक्या देत आहेत, अशा परिस्थितीत केवळ सत्यावर भरवसा ठेवू, परमेश्वरी इच्छेच्या हातात आपल्या दैवाचा झोला सोडून, प्रतापसिंहाने निःशस्त्र सत्याग्रह करण्याचे ठरविले. कंपनी सरकारच्या सैन्यबळापुढे छत्रपतीचे सैन्यबळ जरी काहीच नव्हते, तरी छत्रपतीच्या तक्तासाठी रक्ताचा थेंब न् थेंब खर्ची घालणारे मावळे-मराठे व ब्राह्मणेतर लोक वेळ पडल्यास मधमाशीच्या झुंडीप्रमाणे भराभर बाहेर पडण्यास कमी करणार नाहीत, याची जाणीव कंपनी सरकारला होती. नातूनेसुद्धा छत्रपतीचे उच्चाटन करण्यासाठी इंग्रजी सैन्याची जय्यत तयारी करण्याचा मंत्र रेसिडेंट ओव्हन्सच्या कानात फुंकला होता. आणि त्याप्रमाणे तोफखाना, घोडेस्वार यांसह ग्रेनेडिअरची पंचविसावी पलटण ३१ ऑगस्ट १८३९ रोजी पुण्याहून निघून ४ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता साता-यास येऊन थडकली, ग्रामण्याच्या तंत्रमंत्राने, राजकारणाच्या कागदी बुजगावण्याने किंवा, मुंबईच्या गव्हर्नरच्या तोंडी धमकावणीने प्रतापसिंहाचा प्रताप जेव्हा केसभरसुद्धा डळमळला नाही, तेव्हा इंग्रजी सैन्याच्या हिंमतीवर छत्रपतीला अचानक पकडून हद्दपार करण्याचा बळजबरीचा बेत नातूकंपूने ठरविला. या बेताची कुणकुण महाराजांना लागताच, त्यांनी या जय्यत तयारीला तोंडघशी पाडण्याचा निश्चय केला. त्यांनी विचार केला की, जर मी सर्वस्वी निष्कलंक आहे, तर कंपनी सरकारच्या सशस्त्र प्रतिकाराची मी कशाला पर्वा ठेवू? ज्यांनी आपल्या न्यायबुद्धीचाच खून पाडलेला आहे; सांगलीकर, नातू, किब्यासारख्या राज्यद्रोही हरामखोरांना जहागिरीचा मलीदा चारून माझ्याविरुद्ध उठविलेले आहे, त्यांनी माझ्यावर शस्त्र चालवून माझा घात केला.
तर त्यात काय आश्चर्य? ताबडतोब महाराजांनी सेनापती बाळासाहेब राजे भोसले, यांच्याकडून स्वतःच्या सैन्याची कवाईत करविली, आणि आपण स्वतः सैनिकांच्या हातातली सर्व शस्त्रे काढून घेतली. बाळासाहेब सेनापतीच्या कमरेची समशेर काढून घेऊन त्याला निःशस्त्र केले. राजवाड्यातल्या पटांगणातल्या सर्व तोफातील दारू काढून त्या पाण्याने धुऊन रिकाम्या केल्या आणि सर्व सातारा शहरभर निःशस्त्र सत्याग्रहाचा जाहिरनामा पुकारला. प्रजाजनांना आपल्या गळ्याची शपथ घालून महाराजांनी असे विनविले की आज रोजी कंपनीसरकारच्या गो-या सोजिरांनी जरी तुमची घरेदारे लुटली, तरी कोणीही आपला हात वर करता कामा नये.
बांधवहो, निःशस्त्र सत्याग्रहाची मोहीम महात्मा गांधींच्याही पूर्वी शंभर वर्षे आपल्या प्रतापसिंह छत्रपतींनी एक वेळ या खुद्द साता-यात आणि तीही अशा काळात की हुं म्हणताच कंपनीच्या साथीदारांची व सैन्याची एकजात कत्तल करण्याची धमक मावळ्यांच्या मनगटात रसरसत होती, अशा स्थितीत शक्य करून दाखविली, हे ऐकून अंतःकरणात कौतुकाचा व अभिमानाच दर्या खळबळणार नाही, ते अंतःकरण मर्द मावळ्याचे नसून कारस्थानी भटाचेच असले पाहिजे. ता. ४ सप्टेंबर १८३९ ची संध्याकाळ झाली. आज बाळाजीपंत नातूच्या कारस्थानामुळे, सातारच्या राजधानीत शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा भर मध्यरात्री मुर्दा पडणार, या कल्पनेने अस्तास जाणारा सूर्यनारायण रक्ताची अश्रु टपटपा गाळीत रक्तबंबाळ होऊन सह्याद्रीच्या शिखराआड नष्ट झाला. स्वराज्यद्रोही आप्पासाहेब भोसला, आणि महाराष्ट्राच्या मानेवर सुरी फिरविणारा कसाब बाळाजीपंत नातू या दोघांच्या अधिपत्याखाली गो-या सोजिरांच्या पलटणी सातारा शहराची सर्व नाकी अडवून उभ्या राहिल्या. रेसिडेंट ओव्हन्स साहेबांची अश्वारूढ स्वारी इकडून तिकडे भरा-या मारू लागली. पण साता-यात त्यावेळी काय होते? जिकडे तिकडे सत्याग्रह! शुद्ध स्मशानशांतता! प्रतिकाराची उलट सलामी छत्रपती देतील, ही नातूची कल्पना फोल ठरली. प्रजाजनांनी आपापली भोजने उरकून यथास्थितपणे निद्रेची तयारी केली. खुद्द छत्रपती भोजनेत्तर आपल्या महालात खुशाल झोपी गेले.
निष्कलंक मनोवृत्तीला निद्रादेवी कधीही बिचकत नाही, याचे प्रत्यंतर येथे दिसले. शनिवार वाड्यावर झेंडे फडकविणारे राष्ट्रीय पक्षाचे ब्राह्मण वीर लोकमान्य नातू मध्यरात्रीच्या सुमारास ओव्हन्सच्या कानाला लागले. राजवाड्याला सोजिरांचा गराडा पडला. घरभेद्या आप्पासाहेब पुढे, पाठीमागे रेसिडेंट ओव्हन्स आणि चार पाच गोरे सोजीर, अशी ही चांडाळ चौकडी, आज आपण ज्या राजवाडयासमोर जमलेले आहोत त्या राजवाड्याच्या छातीतला प्राण हरण करण्याकरिता यमदूताप्रमाणे आत घुसली. त्यांनी देवघराचे पावित्र्य पाहिले नाही, त्यांनी झनान्यातील राजस्त्रियांच्या अब्रूकडे पाहिले नाही. ते खाडखाड बूट आपटीत छत्रपतीच्या शयनमंदिराकडे गेले. आप्पासाहेबांनी `हे आमचे दादा’ असे बोच करून दाखविताच त्यावेळचा महाराष्ट्राचा ओडवायर कर्नल ओव्हन्स झटदिशी पलंगाजवळ गेला आणि गाढ निद्रेत घोरत असलेल्या छत्रपतीला त्याने मनगटाला धरून खसकन पलंगावरून खाली ओढले आणि `तुम हमारे साथ चलो’ असे म्हणून तो त्यांना खेचू लागला. सत्याग्रही छत्रपति काहीही प्रतिकार न करिता मुकाट्याने चालू लागले. त्यावेळी ते फक्त एक मांडचोळणा नेसलेले होते. त्याशिवाय अंगावर दुसरे काहीही वस्त्र नव्हते. छत्रपतींची अशी उघड्याबोडक्या स्थिती उचलबांगडी झालेली पाहून झनानखान्यात हलकल्लोळ उडाला. चाकर माणसे भयभीत होऊन हातात दिवट्या घेऊन सैरावैरा धावपळ करू लागली. एकच आकांत उडाला. सर्व लोक निःशस्त्र, त्यातच खुद्द छत्रपतींची सत्याग्रहाची शपथ, यामुळे कोणाचाच काही उपाय चालेना. महाराजांच्या दंडाला धरून ओव्हन्सने त्यांना राजवाड्याबाहेर आणले, आणि तयार असलेल्या पालखीत त्यांना कोंबले. जवळच उभे असलेल्या बाळाजीपंत नातूच्या डोळ्याचे पारण फिटले. परशुरामाचा वर पूर्ण झाला. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे प्रेत भिक्षुकशाहीच्या तिडीवर चढलेले पाहून रेसिडेंट ओव्हन्सला स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला. आप्पासाहेब भोसल्याचा घरभेदपणा कचकाऊन फळफळला. एक मिनिटाच्या आत सोजिरांच्या पहा-याखाली सत्याग्रही छत्रपतीची पालखी चालू लागली. प्रजाजन भराभर जमा होऊ लागले. मध्यरात्रीची वेळ, तरीसुद्धा सातारचा राजरस्ता नरनारींनी गजबजून गेला.
आपला छत्रपति असा उघडा बोडका पकडून नेताना पाहून त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचे धबधबे वाहू लागले. पण करतात काय? महाराजांची सत्याग्रहाची शपथ अक्षरशः पाळणे जरूर होते. इतक्यात कोणी एकाने धावत धावत येऊन, आपल्या घरातील एक शाल आणून महाराजंच्या अंगावर घातली. सातारच्या ब्राहणेतर प्रजेने छत्रपतींना अखेरचा मुजरा ठोकला आणि क्रिस्टॉल नावाच्या सोजिराच्या आधिपत्याखाली पालखी साता-याच्या हद्दपार झाली. इतक्यात आप्पासाहेब भोसल्याच्या चिथावणीवरून सेनापती बाळासाहेब भोसल्यांना काही सोजिरांनी पकडून धावत धावत छत्रपतीच्या पालखीजवळ नेले व ते सेनापतीचे पार्सल धाडकन त्याच पालखीत फेकून दिले. बाळासाहेबाने ताडकन पालखीच्या बाहेर उडी मारली आणि त्वेषाने म्हणाला, ``खबरदार, ज्या छत्रपतीच्या पायाला स्पर्श करण्याची आजपर्यंत कोणाचीही ताकद झाली नाही, त्यांच्या बरोबरीला बसून छत्रपतीच्य तक्ताची मी अवहेलना करू काय? मी जरी निःशस्त्र असलो तरी अशाही स्थिती मी पाच पन्नासांना लोळवायला कमी करणार नाही हे लक्षात ठेवा.’’ इंग्रजांच्या लोकविश्रुत पॉलिसीप्रमाणे छत्रपतींचा हद्दपारीचा शेवटला मुक्काम कोणालाही कळणे शक्य नव्हते. पहिल्या दिवशी क्रिस्टॉल कंपूने आठ मैलाची मजल मारून निंबगावात मुक्काम केला. त्या ठिकाणी गाई म्हशी बांधण्याच्या गोठ्यात, जेथे शेण आणि मूत्र सर्वत्र पसरलेले आहे, उंदीर, झुरळे, चिलटे, पिसवा वगैरेंचा सुळसुळाट आहे, अशा जागेत छत्रपतींना आणून बसविले. बांधवहो! या वेळची छत्रपतींच्या मनःस्थितीची आपणच कल्पना करावी हे बरे. दुस-या दिवशी मागोमाग महाराजांची राणी, कन्या सौभाग्यवती गोजराबाई वगैरे कबिले येऊन दाखल झाले. गाई म्हशीच्य गोठ्यात हिंदूंचा बादशहा हरामखोर ब्राह्मणांच्या कारस्थानामुळे अस्ताव्यस्त स्थितीत पडलेला पाहून राजवैभवात वाढलेल्या त्या राजस्त्रियांच्या अंतःकरणाची स्थिती काय झाली असेल याची कल्पना करवत नाही! पण कल्पना कशाला? इतिहास काही मेला नाही. राजहत्येबरोबर बाळाजीपंत नातूला भ्रूणहत्येचे पातक कमवायचे होते. त्या पातकाचा फोटोग्राफ इतिहासात उमटलेला आहे. नातूच्या वंशजांनी आणि त्याच्या स्वराज्यद्रोही राष्ट्रीय सांप्रदायिकांनी आपल्या बेचाळीस बापजाद्यांची पुण्याई जरी खर्ची घातली तरी तो ऐतिहासिक पुरावा नष्ट होणे शक्य नाही. आपला प्रियकर बाप, साता-याचा छत्रपति, हिंदी स्वराज्याचा हिंदू बादशहा गाई म्हशीच्या गोठ्यात वस्त्रांशिवाय बसलेला पाहून गोजराबाईने एक भयंकर किंकाळी फोडली व ती बेशुद्ध पडली. बांधवहो! यापुढील प्रकार अत्यंत भयंकर. गोजराबाई आठ महिन्यांची गरोदर होती. बेशुद्ध पडताच तिचा गर्भपात झाला. चहूकडे जंगल, वै-याच्या कैदत माणसे सापडलेली, अशा स्थितीत त्या बिचारीला कसले औषध आणि कसला उपचार! दैवाची खैर, म्हणून बिचारीचा जीव तरी वाचला. येथून मुक्काम हालताच तिकडे बाळाजीपंत नातूचे विचारयंत्र सुरू झाले. या महात्म्याने असा विचार केला की छत्रपतीच्या बरोब बाळासाहेब सेनापती असणे ही मोठी घोडचूक. चिटणीसाला जसा अचानक उचकून फेकून दिला, तशी बाळासाहेब सेनापतीची वासलात लावली पाहिजे. नाही तर हा छत्रपति त्याच्या साहाय्याने एकादे नवीन स्वराज्य देखील निर्माण करायचा! म्हणून बाळाजीपंताने आपला कुळस्वामी ओव्हनसाहेब याच्याकडून सेनापतीला पकडण्याचे वारंट सोडले. वारंटातील मजकूर असा होता की, साता-यात तुम्हाला लाखो रुपयांचे देणे आहे ते फेडल्याशिवाय तुम्हाला साता-याबाहेर जाता येत नाही. हा आरोप बनावट होता हे सांगणे नकोच. तथापि दुस-या मुक्कामावर वारंटाची टोळी येताच सेनापतीने आपल्या व सेवकांच्या अंगावरील उरलेले काही दागदागिने देऊन त्या शिपायांचा काही तरी समजूत करून (कारण हे शिपाई पूर्वी सेनापतीच्या हुकमतीखाली होते व त्यांना ख-या गोष्टी माहीत होत्या.) त्यांना साता-यास परत रवाना केले. मुक्काम दर मुक्काम घोडदौडीची पायी चाल करून वाटेत बाळासाहेब सेनापतीला आमांशाचा रोग जडला व रक्त पडू लागले. म्हणून औषधोपचारासाठी वाटेत मुक्काम करण्याबद्दल छत्रपतींनी क्रिस्टॉल साहेबाची नानाप्रकारे विनवणी केली. ओव्हन्स रेसिडेंट हा जसा त्या वेळचा ओडवायर होता, तसाच त्याचा साथीदार हा नराधम क्रिस्टाल त्या वेळचा डायर म्हटला तरी चालेल. त्याने विनंतीचा अवमान करून मुक्कामाची दौड चालूच ठेवली.
मात्र बाळासाहेबाला त्याने का स्वतंत्र मेण्यात चालविले होते. परंतु औषधोपचाराची तर गोष्टच राहूद्या पण विचा-याच्या नुसत्या अन्नपाण्याचीही कोणी व्यवस्था पाहिली नाही. अखेर एका मुक्कामावर क्रिस्टॉल साहेबांची सहज लहर लागली म्हणून मेणा उघडून पाहतात तो बाळासाहेबांचे प्रेत कुजून त्याला घाण सुटलेली! बाळासाहेबांचा मृत्यू होताच त्यांच्या पतिपरायण पत्नीने एक दोन दिवसांतच प्राणत्याग केला. अशा रीतीने बाळाजीपंत नाते आपल्या ब्राह्मण कारस्थानाच्या तिरडीवर आप्पासाहेब भोसल्यांच्या हातून बांधलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मुडद्याची प्रेतयात्रा बनारसला पोचेपर्यंत वाटेत अनेक हत्या घडल्या. बनारसला छत्रपति ह्यांना तुरुंगात ठेवले आणि अशा रीतीने सध्याच्या राष्ट्री पक्षांचे इतिहासप्रसिद्ध पूर्वज लोकमान्य बाळाजीपंत नातू, चिंतामणराव सांगलीकर, वगैरे भू-देवांचे स्वराज्यद्रोही कारस्थान परशुरामाच्या कृपेने तडीस गेले. बाळाजीपंत नातू याने कंपनी सरकारकडून जहागि-या मिळविल्या, अप्पासाहेब भोसल्याची दिवाणगिरी मिळविली, नौबदीचे अधिकार मिळविले, बाळा जोशी नावाच्या एका हलकट वाईकर ब्राह्मणाला त्याच्या `राष्ट्रीय’ खटपटीबद्दल जहागिरी बक्षिस दिली, आणि नातूचे परात्पर गुरु रेसिडेंट ओव्हन्स साहेब यांना मुंबई सरकारच्या शिफारसीवरून वार्षिक चारशे पौंडांचा जादा मलीदा सुरू झाला. सख्या थोरल्या भावाच्या सर्वस्व-घाताच्या रक्तांनी माखलेल्या अप्पासाहेब भोसल्याने १८ नोव्हेंबर १८३९ रोजी पणास राज्याभिषेक करून घेतला आणि रात्रौ दीपोत्सव करण्याच्या बाबतीत स्वराज्यद्रोही ब्राह्मणांनी कस्सून मेहनत घेतली. बांधवहो! स्वराज्याच्या अधःपाताचा हा इतिहास मी पणास फारच थोडक्यात सांगितला आहे. हा इतिहास मी लवकरच ग्रंथरूपाने बाहेर काढणार आहे; त्यावेळी स्वराज्यद्रोहाच्या रंगपटावर आणखी शेकडो ब्राह्मण वीर महावीर आणि त्यांची असंख्य अमानुष कारस्थाने आपल्या दृष्टीला पडतील. हा सर्व इतिहास जिवंत राखण्याचे श्रेय एका कायस्थ वीराने मिळविलेले आहे. प्रतापसिंहावर नातू कंपूने अनन्वित किटाळ उभारून त्यांना तुरुंगात टाकल्यानंतर या अन्यायाची दाद पार्लमेंटापर्यंत पोचविण्याकरिता
हिंदवी स्वराज्याचे पहिले डेप्युटेशन
विलायतेस घेऊन जाणारा सच्चा कायस्थ बच्चा रंगो बापूजी गुप्ते हा होय. याने सतत सोळा वर्षे विलायतेत झगडून न्याय मिळविण्याचा यत्न केला. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणा, की ज्या दादजी नरस प्रभूने आद्य छत्रपति शिवाजी महाराज यांच्याशी स्वराज्यस्थापनेची आणभाक केली, त्याच्याच अस्सल चौथ्या वंशजावर त्याच हिंदवी स्वराज्याच्या भिक्षुकशाहीकडून झालेल्या खुनाचा न्याय मिळविण्यासाठी विलायतेत जाण्याचा प्रसंग यावा हा योगायोग विलक्षण नव्हे काय? असो. रंगो बापूजीची विलायतेची कामगिरी हा एक स्वतंत्र विषय आहे. तो आपल्याला माझ्या पुस्तकातच पहावयाला मिळेल, इतके सांगून मी पुरे करितो.
[विजयी मराठा, पुणे जून १९२२]