श्री संत गाडगेबाबा
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
पहिल्या आवृत्तीचं पहिलं पान
सुंदर ते ध्यान कीर्तनी शोभलें । करीं धरियेले गाडगे काठी ।।
डोई शुभ्र केस उडती वा-याने । चिंध्या प्रकाशाने चमकती ।।
कीर्तनाचे रंगी डुल्लतो प्रेमानें । भजनानंद म्हणे ढेबूजीचा ।।
लोकहितवादी दीनोद्धारक कर्मयोगी
श्री संत गाडगेबाबा
अनुहाताचा करुनी टाळ । मन मृदंग विशाळ ।।
बुद्धि तुंब्याचा करूनी वीणा । विवेकाची दांडी जाणा ।।
इन्द्रिय खुंट्या करूनी स्थिर । हरीनामाचा गजर ।।
तुका म्हणे आदि अंत । वाचे बोलावा भगवंत ।।
- तुकाराम
लेखक –
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे
प्रकाशक –
श्री गाडगे महाराजा मिशन (रजि.)
नाशिक
प्रकाशन – मार्च १९५२
किंमत अडीच रुपये
लेखकाचं मनोगत
देवडीवरचा मुजरा
साधू संत महंतांची चरित्रे आजकालच्या पिढीला टाकाऊ वाटतात. हातातही धरणार नाहीत कोणी. कारणे उघड आहेत. चालू घडीच्या समाजजीवनाचे बिनचूक मार्गदर्शन करण्यासारखे असतेच काय मुळी त्यात? आजवरच्या अनेक साधू संतांनी देव, देवता, धर्म, व्रते, दाने, तीर्थयात्रा यांचेच प्रचंड बंड माजवून लोकांना देव-खुळे नि धर्मवेडे बनवले. मोक्षाच्या भरंसाट कल्पनांनी कोटिकोटी अडाणी स्त्री-पुरुषांना संसारातून उठवून भिकेला लावले. दगड माती धातूंच्या मूर्तीचे भजन पूजनाचे लोकांना वेड लावून त्याना माणसांतून उठवलें. माणुसकीला पारखे केले. माणसांपेक्षा दगड धोंडेच भाग्यवान ठरले. अन्न अस्तर आसऱ्याला आंचवलेल्या माणसांसाठी त्यांची तरतूद करण्याऐवजी, देव देवळांच्या उभारणीसाठी आणि ऐदी-वैरागी गोसावी भट भिक्षुकांना निष्कारण पोसण्यासाठी अब्जावधि रुपयांची खैरात चालू झाली. माणसांपेक्षा फत्तरी देवदेवतांची आणि त्या परान्नपुष्टांची प्रतिष्ठा वाढली. तिरस्करणीय बुवाबाजीचा जन्म येथेच झाला.
माणुसकीची अवहेलना आणि बदनामी करणाऱ्या या परिस्थितीला जोरदार कलाटणी देण्याचे यत्न अनेक शहरी सुधारकांनी आजवर पुष्कळ केले. पण त्या बुद्धिवादी यत्नांची आंच लक्षावधि खेड्यांत पसरलेल्या अडाणी बहुजन समाजांपर्यंत जाऊन कधी पोचलीच नाही. आणि मुख्य अडचणीचा प्रश्न तर या कोटिगणति खेडूतांचाच आहे. त्यांच्या आचार विचारात आरपार क्रांति घडवण्यासाठी तेथे पाहिजे जातीचा. नुसता `जातीचा` असूनहि भागणार नाही. तर ज्या पूर्वीच्या साधू संतांनी देव धर्मविषयक भ्रमिष्टवादाचा फैलावर केला, त्यांच्याच `मातीचा` तो असल्याशिवाय, क्रांतीचे हे महान कार्य तडीला जाणार नाही.
श्री गाडगेबाबा त्याच नि तसल्याच जातीचे नि मातीचे चालू घडीचे महान क्रांतिकारक `साधू` आहेत. पण त्यांना कोणी साधू संत, महाराज म्हटलेले खपत नाही. संतांविषयी त्यांना अपरंपार आदर. संत कोणाला म्हणावे, यावर अनेक पूर्व संतांचेच दाखले देऊन ते प्रवचन करू लागले म्हणजे त्यांची रसवंती विलक्षण प्रेमादराने नाचू लागले. "कुठे ते ज्ञानोबा तुकाराम एकनाथ कबीरासारखे मोठमोठे संत आणि कुठे मी? कोणत्या झाडाचा पाला?" ही कबुली त्यांच्या प्रत्येक कीर्तनात असते. देवकोटी किंवा संतकोटीपेक्षा साध्यासुध्या मानवकोटीचेच जिणे पत्करून, मानवतेची कट्टर अभेदाने सेवा करीत राहण्यातच मानवजन्माचे सार्थक आहे, हा बाबांच्या आचारधर्मातला एक ठळक कटाक्ष.
त्यांची धर्मविषयक मतें आजकालच्या सुधारकांनाही लाजवील इतकी उत्क्रांत आहेत. स्पष्टच म्हणायचे तर, अस्पृश्योद्धार, पशू पक्षी - हत्या बंदी, अमानुष नि खुळचट रूढींचे उच्चाटन आणि आजकाल महत्त्व पावलेला खराट्याचा धर्म, महात्मा गांधीजींच्या आंतल्या आवाजात स्फुरण पावण्यापूर्वी कितीतरी वर्षे आधी गाडगेबाबांनी प्रत्यक्ष प्रचारात आचारात आणलेला होता. फरक इतकाच की गांधीजींच्या लहान सहान हालचालींच्या मागे पुढे प्रसिद्धी तंत्राचे पाठबळ मोठे आणि गाडगेबाबांना नेमके त्याचेच वावडे.
१) गांजा भांग अफू दारू व्यभिचारासारख्या व्यसनांचा कडवा निषेध
२) शेतकरी कष्टकरी जनतेला साक्षरतेचा, साक्षेपाचा, अखंड उद्योगाचा, सहकाराचा आणि काटकसरीचा अट्टहासी उपदेश
३) सावकारशाहीच्या नि भांडवलशाहीच्या कचाट्यात चुकूनही न जाण्याचा इशारा
आणि
४) माणुसकीला बदनाम करणारे रूढीरिवाज नि देवकार्ये यांपासून दूर राहण्याचा उपदेश
हे गाडगेबाबांच्या गेल्या ४५ वर्षांच्या प्रचारकार्यातले मुद्दे लक्षांत घेतले, तर त्यांना समाजवादी सत्यशोधक म्हणायलाही कांही हरकत नसावी. फरक एवढाच, शहरी चळवळे फक्त शहरातूनच समाजवादी तत्त्वांची नुसती पुराणे सांगत वावरत असतात आणि गाडगेबाबा लाखलाख गणतीच्या खेडूती बहुजन समाजाच्या जीवनाशी समरस एकवटून, स्वतःच्या आचरणाने त्यांनाही आपल्यामागे घेऊन जात असतात.
धर्मपंथ असो वा धर्मग्रंथ असो, त्यातल्या यच्चयावत्, दांभिक फिसाटांचा कडकडून निषेध करणारा आणि देशकालवर्तमानानुसार जनतेला निर्मळ माणुसकीचा नवा आचार-विचार-धर्म शिकवणारा साधू म्हणा, संत म्हणा, किंवा महात्मा म्हणा, काय वाटेल ते नाव द्या, श्री गाडगेबाबांच्या पूर्वी कोणी झालेला आढळत नाही आणि पुढे त्यांची ही लोकोत्तर परंपरा कोणी टिकवून चालवील असेही वाटत नाही. त्यांच्या निःस्पृहतेला नि निरिच्छतेला निरुपमा हेच विशेषण छान शोभते.
अशा महान तपस्वी नि कट्टर कर्मयोगी महात्म्याच्या चरित्रलेखनाचे काम माझ्याकडे अवचित नि अयाचित आले. सन १९५०च्या सप्टेंबरात बाबांचे २-३ शागीर्द एकाएकी माझ्यासमोर दत्त म्हणून उभे राहिले. `श्री गाडगेबाबांचे चरित्र मी लिहावे` अशी त्यांनी विनंती करताच, देव धर्म-साधूंविषयी माझा निश्चित मतांचा आराखडा मी त्यांच्यापुढे स्पष्ट मांडला. "तर मग हे काम करण्यासाठी आम्ही बाबांच्या भक्तमंडळींनी केलेली तुमची निवड बिनचूक बरोबर आहे." असा त्यांचा एकच अभिप्राय पडला.
३-४ वर्षांपूर्वी सहज एकदा केवळ जिज्ञासा म्हणून दादर कॅडेल रोडवरील एका वाडीत झालेले गाडगेबाबांचे कीर्तन दूर बाजूला उभे राहून मी ऐकले होते. बस्स. यापेक्षा त्यांचा माझा फारसा कधी संबंधच आलेला नव्हता. वृत्तपत्रकार नात्याने, अर्थात, त्यांच्या क्रांतिकारक समाजवादी चळवळीकडे माझे लक्ष होतेच होते. माणसांनी माणसांशी माणसांसारखे वागावे कसे आणि हा मानवधर्म आचरतांना आत्मोद्धाराबरोबरच समाजोद्धारहि कसा साधावा, ह्याचा गाडगेबाबांच्या कीर्तन - प्रचाराबरोबरच त्यांनी पंढरपूर, आळंदी, देहू, नाशिक वगैरे ठिकाणी उभारलेल्या धर्मशाळा सदावर्ते पाणपोया नि बोर्डिंगे यांवरून मी चांगलाच कानोसा घेतला होता.
गाडगेबाबांविषयी अनेकजणांकडून आठवणींची पुष्कळ पुडकी मजकडे आली. त्यांच्या कार्याच्या तपशिलांची लेखी छापील बाडेंच्या बाडे टेबलावर येऊन पडली. शेकडो फोटोग्राफही आले. या पुस्तकात त्या सगळ्यांचा पुरस्कार करणे कठीण. चरित्राची आणि कार्याची सर्वसाधारण रूपरेषा या पुस्तकात देणे मला शक्य झाले आहे. कदाचित पुढेमागे बाबांचे एक मोठे चरित्र, आठवणींचा संग्रह, कीर्तनांतली प्रवचने आणि फोटोंचे अल्बम श्री गाडगेबाबा मिशन तर्फे प्रसिद्ध करण्याचा कानोसा मला लागलेला आहे.
विवेचनाच्या ओघात देव, देवळे, धर्म, वारकरी पंथ आणि अध्यात्मादि भानगडी यांविषयी व्यक्त केलेल्या विचारांबद्दल माझा मी जबाबदार आहे. लोकोत्तर कर्मयोगी महात्म्यांची जीवनकथा पारिजातकाच्या परिमळासारखी मातीलाही सुगंधी करते. श्री गाडगेबाबांच्या या कथानकाशी मी घेतलेला तन्मयतेचा तो आनंद वाचकांनाही लाभो.
महाराष्ट्राचा नम्र सेवक
केशव सीताराम ठाकरे
मुंबई नं. २८
श्री एकनाथ पष्ठी,
ता. १७ मार्च १९५२
`मला कुणी शिष्य नाही, मी कुणाचा गुरू नाही`
प्रकरण १ ले
ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा
"सखू माहा कारभार अटपला! मराले शेवटी मी लोकांच्या उंबरठ्यात ईऊन पळलो मेल्यावर मळ जावाले पैसा लोकाचाच कायनं आली असिल हे अवदसा? देवकाऱ्याच्या दारूनं! काहाचे हे देव अन् काहाचे ते दगळा गोटयाईचे देवकारे? दारूच्या पाई घरदार, वावर जमिन मान मयराद्याले सोळल्यानं आपल्या संसाराचे कोयसे झाले.
आता माहा आईक. आताच्या आता तो खंडोबा ती आसरा अन् ते सर्वेच्या सर्वे देवपाटातले दगळ गोटे दे फेकुन भुलेसरीत. आखीन एक काम. आपल्या लाळाच्या डेबुले वारा नोको लागु दिऊ त्या देवदेवीचा. निर्मय राहुदे त्याले या देवदेवी अन् देवकाऱ्याच्या पापापासुन, अरेरे काहावे हे धरम अन् कुयधरम? या खोट्या देवाईले कोंबळे बकऱ्याईचे इनाकारन कापन्याच्या पापी फंदात मी पळलो नसतो त दारूच्या नांदात कायले गोयलो असतो? लोकाईले काम्हुन बदलामी देवाव? माझ्या जोळ पैशाईचा आसरो होता तथुरोक मले त्याहीनं दारूसाठी कोरलं. लोक असेच असतात सखू. पन आता माह्या डेबूजीले संभाळवो बरं? तो पिसाट, देवाले न माननारा झाला तरी बरं होईन. पन त्याले या बकरेखाऊ अन् दारुपिऊ देवाचा नांद लागु देऊ नोको बरं?"
देवकार्याची फलश्रुति
"सखू माझा कारभार आटोपला! मरायला अखेर मी परक्यांच्या दारवंटात येऊन पडलो! मेल्यावर जाळायलासुद्धा पैका परक्यांचाच. कशाने आली ही अवदसा? देवकार्याच्या दारूने. कसले हे देव नि कसले त्या दगड धोंड्यांचे ते देवकार्य? दारूच्या पायी घरदार शेतवाडी मानमरातबाला मुकून आपल्या संसाराचे कोळसे झाले. आता माझे ऐक. आत्ताच्या आत्ता तो खंडोबा, ती आसरायी आणि ते सगळे देव्हाऱ्यातले दगडधोंडे दे भिरकावून भुलेश्वरी नदीत. आणखी एक काम. आपल्या लाडक्या डेबूजीला वारा नकोसा लागू देऊ त्या देवदेवींचा. निर्मळ ठेव त्याला या देवदेवी नि देवकार्याच्या पापापासून, अरे अरे! कसले हे धर्म नि कुळधर्म या खोट्या देवाना कोंबडी बकऱ्यांचे हकनाहक बळी देण्याच्या पापी फंदात मी पडलो नसतो तर दारूच्या व्यसनात कशाला गुरफटलो असतो? लोकांना दोष कशाला द्या. होती माझ्याजवळ पैक्याची माया, तोंवर पोखरले दारूसाठी त्यांनी मला. समाज असाच असतो सखू. पण आता माझ्या डेबूजीला संभाळ. तो सैराट नास्तिक बाटगा झाला तरी परवडले. पण त्याला बोकडखाऊ दारूड्या देवांचा नाद लागू देऊ नकोस."
इतके बोलून झिंगराजीने प्राण सोडला. सखीबाईने हंबरडा फोडला. वऱ्हाडातील अमरावती तालुक्यातील कोतेगावची ही सन १८८४ सालची गोष्ट. झिंगराजी हा शेणगावच्या घरंदाज नागोजी परिटाचा नातू. घराणे सुखवस्तू जातीने परीट, तरी मुख्य व्यवसाय शेतीचा गोठा गाई-म्हशी बैलानी डंबरलेला. परीट जमात मागासलेली. तशात नाक्षर. अनेक अडाणी रुढी, भलभलती कुलदैवते, त्यांना नेहमी द्याव्या लागणाऱ्या कोंबडे-बकरी-दारूचे नवस, यांचा कहर माजलेला. कोणी कितीहि शहाणा असला, विचारी असला, तरी जमातीच्या मुर्वतीसाठी वर्षातून एकदा तरी देवकार्याचा धुडगूस घालून दारूच्या पाटात बकऱ्याची कंदुरी प्रत्येक घरात झालीच पाहिजे, असा त्यांचा सामाजिक दण्डक, घरातल्या हव्या त्या बऱ्यावाईट भानगडीसाठी खंडोबाला आसरावीला किंवा गावदेवाला संतुष्ट करायचे म्हटले का आलीच कंदुरी नि दारू, मूल जन्माला आले, करा कंदुरी.
तान्ह्या मुलाला पडसे ताप खोकला आला, बोलवा भगताला देव खेळवायला, कापा गावदेवापुढे कोंबडे, दाखवा दारूचा नैवेद्य, लावा त्याचा अंगारा का म्हणे होणारच ते खडखडीत. देवकार्य केले म्हणजे पाहुण्यांचा बरोबरीने यजमानानेहि दारूचा एक घोट तरी घेतलाच पाहिजे. घेतला नाही, तर देव कोपणार, अंगावर नायटे गजकर्ण उठणार, घरादाराचे वाटोळे होणार. अशा धमकीदार धर्मसमजुतीपुढे मोठ्यामोठ्या मानी माणसानाही इच्छा असो वा नसो मान वाकवून दारू प्यावीच लागते. देवकार्यच कशाला? पाहुणा राहुणा आला की त्याच्यासाठी (मटणाचा बेत नसला तरी) दारूची बाटली आणलीच पाहिजे. दारू देणार नाही तो यजमान कसला नि घरंदाज तरी कसला?
सारी परीट जमात असल्या फंदात अडकलेली, तर बिचारा झिंगराजी त्या चरकातून सुटणार कसा? बरीच वर्षे त्याने दारूचा मोह टाळून, संसार-व्यवहार कदरीने केला. अखेर आजूबाजूच्यांच्या नादाने तो देवकार्यांच्या निमित्ताने अट्टल दारुड्या बनला. दारूचे व्यसन लागायचाच कायतो अवकाश असतो. ते लागले का संसाराच्या नौकेला हळूहळू भोके पडून ती केव्हा सफाचट रसातळाला जाईल, हे ज्याचे त्यालाहि समजत उमजत नाही. सर्वस्वाला मुकून झिंगराजी फुप्फुसाच्या रोगाने अंथरुणाला खिळला. घरदार, शेतवाडी, गुरेढोरे, आधीच वाटेला लागलेली. विष खायलाहि फद्या जवळ उरला नाही. जवळ बायको सखूबाई आणि सन १८७६ साली जन्माला आलेला एकूलता एक मुलगा डेबूजी, दोन वेळा साजऱ्या व्हायची पंचाईत, तेथे कसले आले औषधपाणी? भरभराटीच्या ऐन दिवसात झिंगराजीशेट झिंगराजीशेट म्हणून तोंडभर वाहवा करून त्याच्या पैशाने दारूबाजीच्या मैफली उडवणारे आता थोडेच त्याच्या वाऱ्याला उभे राहणार? शेणगावच्या भुलेश्वरी (भुलवरी) नदीच्या पलीकडे कोतेगाव येथे त्याचे मावसभाऊ यादवजी आणि जयरामजी राहत होते. त्यानी या पतित कुटुंबाला आपल्याकडे नेले. त्याच ठिकाणी मरणाला मिठी मारण्यापूर्वी झिंगराजीने सखूबाईला प्रारंभीचा उपदेश केला.
मुलगी परत घरी आली
मूर्तिजापूर तालुक्यात दापुरे गावी तिचे माहेर होते. वृद्ध आईबाप हयात असून कर्तबगार भाऊ चंद्रभानजी घरदार शेतवाडी पहात होता. ६०-६५ एकर जमीन, नांदते मोठे घर, १०-१२ गुरेढोरे, घराणे चांगले सुखवस्तु होते. म्हाताऱ्या हंबीररावला झिंगराजीच्या मृत्यूची बातमी समजताच, त्याने चंद्रभानजीला पाठवून सखूबाई नि डेबूजीला घरी आणवले. छोटा डेबूजी काही दिवस इतर मुलांच्या बरोबरीने खूप खेळला बागडला, गावाबाहेर हुंदाडला, नदीत डुंबला, आईच्या हाताखाली राबला. एक दिवस तो चंद्रभानजी मामाला म्हणाला, "मामा, गुरेचरणीसाठी नोकर कशाला आपल्याला? मी जात जाईन रोज आपली गुरे घेऊन चरणीला. मला फार आवडते हे काम." "अरेच्चा, वाटला तसा हा पोरगा ऐतखाऊ दिसत नाही. याला कामाची हौस आहे." हे चटकन ओळखून चंद्रभान डेबूजीची गुरेचरणीच्या कामावर नेमणूक केली.
डेबूजीच्या क्रांतिगर्भ जीवनाचा श्रीगणेशा गुरेचरणीने झाला. खरेच, लोकोत्तर युगपुरुषांच्या चरित्रांचा ओनामा गुरेचरणीनेच होत असतोसे दिसते. यादव श्रीकृष्णाने बालपणी गुरेचरणीचीच दीक्षा घेतली होती.
डेबूजीचे गोवारी जीवन
डेबूजीने रोज मोठ्या पहाटे उठावे, गोठा साफ करावा, शिळ्या भाकरीचा तुकडा चावून वर घोटभर पाण्याने न्याहारी करावी, दुपारच्या जेवणासाठी दिलेली कांदाभाकरीची पुरचुंडी बगलेत मारावी आणि गाई म्हशी बैल चरणीला घेऊन जावे. मध्यान्हीला सूर्य आला का गुरांना पाणी पाजून त्यांना सावलीत बसवायचे, आपण भाकर खायची नि रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी भजने गात जवळच लवंडायचे. कित्येक वेळा गुरे डेबूजीची नजर चुकवून शेजारच्या शेतात घुसायची. राखणदार तणतणत यायचा. डेबूजी त्या गुराला वळवून आणून, त्याची हात जोडून क्षमा मागायचा. या त्याच्या विनम्र वृत्तीला इतर गवारी पोरे टिंगलीने हसायची. एकाद वेळी राखणदाराची चपराकहि तो मुकाट्याने सहन करायचा. पण उलट शब्द कधी बोलायचा नाही.
गुराढोरांची जोपासना डेबूजी स्वतःपेक्षा विशेष अगत्याने करायचा. वेळी आपण भाकर खायला विसरेल, पण गुरांची दाणावैरण वेळच्या वेळी द्यायला एकदाहि चुकला नाही. सकाळ संध्याकाळची त्याची गोठेसफाई पाहून शेजारीपाजारी चकित व्हायचे. ४-५ दिवसाआड गुरांना नदीच्या पाण्यात घालून चांगली मालीश करी. त्यामुळे चंद्रभानजीची गुरे म्हणजे दापुरीत नमुनेदार म्हणून जो तो वाखाणू लागला.
डेबूजीची गोवारी भजन-पार्टी
मामी कौतिकाबाई पहाटे उठून जात्यावर गाणी गायची. ती गुणगुणण्याचा डेबूजीला नाद लागला. गावातील मंडळी कधीकाळी भजने गायची ती ऐकून वेडीवाकडी म्हणायची त्याने सुरुवात केली. थोड्याच दिवसात गोवारी मंडळ जमवून नदीच्या काठी भजने चालू केली. रॉकेलचा रिकामा डबा म्हणजे मुरदुंग आणि दगडाच्या चिपांचे टाळ, या साहित्यावर डेबूजीचे हे भजनी मंडळ भजनांच्या कार्यक्रमात खूप रंगू लागले. रोज कोणी ना कोणी एकादा नवीन अभंग ऐकून पाठ करून आणावा नि या टोळीने तो आपल्या भजनात चालू करावा. कामधाम आटोपून रात्रीची भाकर पोटात गेली रे गेली का हे भजनी मंडळ काळोखात गावाबाहेर जायचे नि हरिनामाचा गजर करीत बसायचे. मध्यरात्रीपर्यंत असे होत राहिल्यामुळे, इतर मुले उशिरा उठायची नि उशिरा कामाला लागायची. त्याची तक्रार चंद्रभानजीच्या कानावर गेल्यामुळे, डेबूजीने एकटेच भजनासाठी बाहेर जाण्याचा क्रम चालू केला. पण त्याचे सवंगडी त्याचा पिच्छा सोडणार थोडेच?
सार्वजनिक भंडाऱ्याचा श्रीगणेशा
डेबूजी मंडळाच्या भजनाचे पुढे सप्ताह होऊ लागले. सप्ताहाची समाप्ति प्रसादाने झाली पाहिजे. पोरांची डोकी ती! कित्येकानी आईबापांजवळ मागून, कित्येकानी गावात भिक्षा मागून धान्य जमा केले. गुराख्यांच्या वनभोजनासाठी गोडधड करून द्यायचा खेडेगावच्या लोकांचा प्रघात असतोच. झाले. हां हां म्हणता नदीच्या काठावर गुराख्यानी अन्नकोट उभा केला. डेबूजी म्हणाला, "गळेहो आपुन त साराईच जेवतो खावतो. पन जरा भवताल पाहा ना? किती तरी अंधले, लंगले, रगतपिते, भिकारी मानसं आहेत. त्याहीले बिच्याऱ्याहीले चुकुन तरी कधी नव्हाईची जेवारी बाजरीची भाकर पोटभर खायाले भेटत नाही. आज आपुन त्याहीले सगळ्याईले बलाऊन आनुन पोटभर जेव्याले घालू. अन्नदानासारखं महापुन्य नाही. ते आपले गरीब भाऊ अन बहयनी जेवल्या म्हंजे तोच देवाले खरा नीवद होईन."
डेबूजीच्या भजनमंडळात एक बाबन नांवाचा महार गुराखी होता. त्याने महारवाड्यातले सारे बाप्ये बाया नि मुले शेपाटून आणली. आजूबाजूचे इतर गोसावी फकीर भिकारी पण बोलावले. डेबूजीने सगळ्यांना एका पंगतीत शिस्तवार बसवून ‘पुंडलीक वरदा हारि विठ्ठल’च्या जयघोषात जेवण घातले. ते लोक जेवत असताना डेबूजीने काही निवडक भजने तल्लीनतेने गायली. जेवणाऱ्या मंडळींचा आणि गुराख्यांचा तो प्रसाद सोहळा पहायला जमलेल्या दापुरीच्या गावकऱ्याना एक नवलच आज तेथे दिसले. नंतर गुराखी मंडळी पंगतीने बसली. डेबूजीने बाबाजी गणाजी महाराला अगदी आपल्या शेजारी बसवले. केरकचरा झाडून साफ केल्यावर हा समारंभ आटोपला. पण त्या भ्रष्टाकाराची कुरबूर डेबूजीच्या आजोळी नि गावभर काही दिवस चालूच होती. पण डेबूजीचा खुलासा खोटा पाडण्याचे धैर्य किंवा अक्कल मात्र कोणातही नसे. दापुरीला डेबूजी असे तोवर असले अन्नदानाचे उत्सव त्याने अनेक वेळा केले.
मुलाचे पाय पाळण्यात दिसले म्हणे!
गाडगे महाराज या टोपण नावाच्या असामान्य लौकिकाने वृद्ध डेबूजी गेली ४५ वर वर्षे हीच भेदातीत अन्नदानाची लोकसेवा बृहन्महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात साजरी करताना पाहून, दापुरीच्या त्याच्या त्या बालवयातल्या वर्तनाचा मुलाचे पाय पाळण्यात दिसले अशा ठराविक शब्दांनी गौरव करण्याचा श्रीयुती किंवा संताळी मोह पुष्कळांना होत असतो. इतकेच काय, पण भविष्यकाळी हा कोणीतरी मोठा साधू सत्पुरुष होईल, अशी पुष्कळांनी अटकळ बांधली होती, असे धडधडीत खोटे विधानही करायला कित्येक चुकत नाहीत. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात? कुणाला दिसतात? कोण ते पहातात? बरे, ते दिसतात तर मग त्या बालकाला त्या पायांच्या लक्षणांप्रमाणे पुढे कोणकोण काय काय कसकसले उत्तेजन देतात?
प्रत्यक्ष जन्मदात्या आईबापानाहि त्या पायांच्या लक्षणांची कसली काही कल्पना नसते, अटकळ नसते, जाणीव नसते. ती लक्षणे कुणाला दिसत नाहीत आणि कुणी ती पहातहि नाहीत. आत्मविश्वासाने नि आत्मक्लेशाने एकादा माणूस मोठा कर्तबगार झाला. नामवंत झाला, म्हणजे मग त्याच्या बालपणीच्या खऱ्या खोट्या आठवणी उकरून काढून, भविष्याचे सिद्धांत लढवण्याची कसरत लोक करतात, एवढाच या पाळण्यातल्या पायांचा अर्थ आहे.
स्पृश्यास्पृश्यांच्या सहभोजनाबद्दल आणि नदीकाठच्या भोजनाच्या व्यसनाबद्दल बिचाऱ्या बाल डेबूजीला चंद्रभानजी मामाचा खावा लागलेला कणक्या चोप आज या कल्पना पंडितांच्या हिशेबी कशाला जमा धरलेला असेल? शिवाय महार, मराठे, परीट, सुतार, लोहार सवंगडी आपण एकत्र कां बसवतो खेळतो नि दुपारच्या न्याहारीला एकत्र जेवतो, या कृत्याच्या दूरगामी परिणामांची तरी बाल डेबूजीला काही निश्चित जाणीव असणार थोडीच? आम्ही सगळे एक, यापेक्षा कसली विशेष भावना त्या वयात त्याला असणार? शक्यच नाही. हा एक सद्गुणाचा अंकुर आहे नि तो आपण वाढवला पाहिजे, अशी पुसटसुद्धा कल्पना त्याच्या विचारांना चाटून गेली नसेल. मनाला ज्यात गोडी वाटते तेवढे करावे, अशी बालमनाची ठेवणच असते. तिची बैठक सद्गुणावर स्थिरावणे नि पुढे ती वाढीला लागणे, हा मानवी जीवनातला एक भाग्यवान अपघातच समजला पाहिजे.
एकदा मनुष्य रंकाचा राव झाला म्हणजे त्याच्या कर्तबगारीचे श्रेय आईबापाला नि आजूबाजूच्या अलबत्या गलबत्याना मोफत वाटण्याची वाईट खोड लोकांना असते. रामदासाने म्हणे शिवाजीला राजकारण शिकवले म्हणून तो स्वराज्य स्थापन करू शकला. या सर्वत्र रूढ केलेल्या प्रवादात या वाईट खोडीचा पाजीपणाच स्पष्ट उघड होत नाही काय? अनाथ गुराखीपणापासून लोकहितवादी गाडगे महाराज या कर्मयोगी पदवीपर्यंत सिद्ध केलेल्या डेबूजीच्या जीवनाच्या यशवंत शर्यतीचे श्रेय एकट्या गाडगेबाबांचे आहे. त्यात इतरांना वाटेकरी बनवण्याचा मोह मूर्खपणाचा आहे.
पोहता येत नाही म्हणजे काय?
दापुरी गावच्या पूर्णा नदीत हिवाळ्या उन्हाळ्यात फार मोठा खोल डोह पडायचा. गावातील बरीच मोठी मंडळी नि मुले त्यात पोहायला डुंबायला जायची. एक दिवस डेबूजीच्या मनाने घेतले, ही सगळी माणसे धडाड पाण्यात उड्या मारताहेत, सरासर पोहताहेत, पाणताळी खोल बुडी मारून भरारा वर येताहेत, मजा आहे मोठी. आले डेबूजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. आपल्याला पोहता येते का नाही, याचा कसलासुद्धा विचार न करता, स्वारीने घेतली धडाड उडी डोहात. आणि मग? कसचे काय अन् कसचे काय! लागला ग खायला. घाबरला. ओरडू लागला. आजूबाजूच्यांना वाटले हा मौज करतो आहे. नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरून बुडतो आहेसा दिसता एका दोघानी पकडून काठावर आणला. उपचार केले तेव्हा सावध झाला. "पोहता येत नव्हते तर झक मारायला उडी घेतली कशाला?" जो तो बडबडू लागला. बातमी गावात गेली. आई मामा आजोबा धावत आले.
“कुणी सांगितलं होतं तुला उडी मारायला बाबा" डेबूजीला पोटाशी धरले आणि “भलभलत्या फंदात पडायची गाढवाला फार खोड" म्हणून मामाने दिला भडकावून एक डेबूजीच्या. “खबरदार पुन्हा पाण्यात पाऊल टाकशील तर, तंगडी मोडून टाकीन." असा सज्जड दम भरला.
माणसाला अशक्य काय आहे?
नेपोलियनप्रमाणेच डेबूजी गाडगेबाबांच्या कर्तव्यकोशात अशक्य हा शब्दच नाही. बरोबरीचे सवंगडी धडाधड उड्या मारतात, सपसप सरळ्या मारीत या काठचे त्या काठाला जातात, मनमुराद डुंबतात आणि मी काय वेड्या अनाडी बावळटासारखा त्यांच्याकडे पहात नि त्यांचे कपडे संभाळीत काठावर बसू? छट्! हे नाही चालायचे. पोहायला मला आलेच पाहिजे.
दोन प्रहरी आजूबाजूला कोणी नाहीसे पाहून, पाण्यात उतरून डेबूजी दररोज पोहण्याचा यत्न करू लागला. एक दोन महिन्यांच्या आतच त्याचा आत्मविश्वास बळावला आणि पोहण्याचा, तरंगण्याच्या, बुडी, सराळ्या मारण्याच्या नाना प्रकारात त्याने एवढे प्रावीण्य मिळविले की त्या बाबतीत गावचा नि आसपासचा एकहि आसामी त्याच्याबरोबर टिकाव धरीनासा झाला.
पावसाळ्यात नदीला महापूर आला म्हणजे पुरात सापडलेल्या माणसांना नि जनावरांना वाचवण्याचे कर्म महाकठीण, मोठमोठ्या पटाईत पोहणारांची अक्कल थरथरू लागायची. पण डेबूजी तडाड उडी घेऊन कमाल शहामतीने त्याना सफाईत तडीपार खेचून काढायचा. अशान एकदा पूर्णेला पूर आला असता, पल्याडच्या काठावर पोहत जाण्याची अमृता गणाजी नावाच्या मित्राने डेबूजीशी पैज मारली. लोक नको म्हणत असताहि दोघांनी टाकल्या धडाड उड्या नदी तर काय, एकाद्या खवळलेल्या महासागरासारखी रों रों करीत, गरारा भोवरे भिरकावीत तुफान सोसाट्याने चाललेली. सहज भिरकावलेला लाकडाचा ओढा धड शंभर पावलेसुद्धा सरळ जाई ना. भोवऱ्यात गचकून झालाच तो बेपत्ता! आणि हे दोघे आचरट तर चालले आहेत सपासप हात मारीत पाणी तोडीत! काठावरच्या लोकांच्या तोंडचे पाणी पळाले. काय होतंय नि काय नाही. डेबूजी तर रंडक्या मुंडक्या अनाथ आईचा एकूलता एक मुलगा. कुणी भरीला घातला नि कुणी चिथावले? नसता आपरमात आंगी लागायचा. बरे, घरच्या मंडळींना कळवायचे, तर ही वेळही निघून गेलेली. आता कोणी घरून आलेच तर काठावरच्या लोकांनाच शिव्याश्राप खावे लागणार. सखुबाई तर काठावरच माथे फोडून घेणार.
लोक थिजल्या डोळ्यांनी नुसते पहाताहेत तोंच हां हां म्हणता पार दूरवरच्या पैलथडीवरून डेबूजीची भीमगर्जना ऐकू आली. “आलो रे आलो, सफाईत येऊन पोहचलो." पण त्याचा तो पैजदार दोस्त? अरेरे, तो कुठेच दिसे ना. कशाचा दिसतो तो? काठाजवळ जाता जाताच एका भोवऱ्याच्या गचक्यात तो सापडला नि बुडाला. त्याचे प्रेत पुढे सहा मैलावर लाखपुरीच्या काठाला लागलेले आढळले. पोहण्याप्रमाणेच आट्यापाट्या, हुतुतु, लगोऱ्या, गोठ्या आणि कुस्त्या या कलांतहि डेबूजी दापुरीच्या पंचक्रोशीत कुणाला हार जाईनासा झाला. घरचे खाणेपिणे तसे म्हटले तर यथातथाच. पण अखंड कष्टाची नि श्रमसाहसाची आवड उपजतच त्याच्या अंगी बाणल्यामुळे, डेबूजीची देहयष्टी पोलादी कांबीसारखी टणक कणखर बनत गेली. ना कधी थेटे ना पडसे. आज ७५ वर्षांचे वय झाले आहे तरी हव्या त्या प्रचंड डोहात बेधडक उडी घेऊन सहज लीलेने तडीपार होताना बाबांना पाहून त्यांचे जवान अनुयायी सुद्धा एकमेकांच्या तोंडांकडे पहात उभे राहतात.
गुराख्याचा नांगऱ्या बनला
डेबूजी चांगला १४-१५ वर्षांचा पुऱ्या उफाड्याचा जवान झाल्यामुळे, चंद्रभानजींने त्याची गुरेराखणी बंद करून, "डेबूजी, तू आता शेतावर औताला जात जा." असे सांगितले. शेतकऱ्याच्या पोराच्या हातात औत येणे आणि पांढरपेशाचा पोर मॅट्रिक होणे, जवळजवळ सारखेच म्हटले तरी चालेल. फरक एवढाच की पांढरपेशा पोरगा मॅट्रिक होऊन कमावता होतोच असे नाही, पण शेतकऱ्याचा पोर औताला लागला का त्याची कमावणी तेव्हाच चालू होते.
पडेल ते काम चोख कुशलतेने करायचे ही डेबूजीची कर्मयोगी वृत्ति लहानपणापासून दिसून येते. शेतीचा नांगर हातात येताच, शेतीच्या सगळ्या लहानमोठ्या तपशिलांच्या कामाला त्याने पक्का आवर घातला. औताच्या बैलांची निगा राखण्यात त्याची पहिल्यापासूनच मोठी कदर. स्वतःला वेळेवर भाकर मिळो न मिळो, पण बैलांची वैरण, त्यांची गोठेसफाई, रोजची नदीतली आंगधुणी, गोणपाटाच्या रकट्याने त्यांचे आंग पुसणे इत्यादि कामे डेबूजी अगदी तन्मयतेने करायचा. खांद्यावर आसूड नि नांगर टाकून जवान डेबूजी भजने गुणगुणत आपले बैल घेऊन शेताकडे जाऊ लागला का दापुरी गावच्या बाया बाप्ये नजर लावून कौतुकाने त्या बैलांकडे पहायचे. शेतकाम डेबूजीने पत्करल्यापासून शेतांची सुधारणा झाली, उत्पन्नही वाढले. हरएक काम तो जातीने पाहू लागल्यामुळे, बांध-बंदिस्तीपासून तो पिकाच्या राखणीपर्यंत उधळमाधळीचा किंवा चोरीमारीचा प्रश्नच रहात नसे. धान्याची कणसे दाणे धरू लागली आणि कपाशीची बोंडे डोळे उघडू लागली का डेबूजीचा मुक्काम कायमचा शेताच्या माचीवर. हातात लठ्ठ बडगा घेऊन रात्रभर जागरण. शिवाय दिवसाची दलामल असायचीच. सारांश, शेतीच्या कामात डेबूजी ईश्वरभक्तीइतकाच तल्लीन रंगलेला असायचा.
कायावाचामनेकरून केलेल्या सेवेच्या भक्तीला बिनचूक प्रसन्न होणारा शेतीशिवाय दुसरा परमेश्वर नाही, हा सिद्धांत डेबूजीला याच कोवळ्या वयात मनोमन पटला आणि येथेच त्याच्या भावी चरित्राच्या उज्ज्वल कामगिरीचा पाया भक्कम बसला.
कसे होणार याचे दोन हाताचे चार हात?
लहानपणी मुलांमुलींची लग्ने लावण्याचे व्यसन खेड्यापाड्यांत आणि मागासलेल्या नाक्षर शेतकरी वर्गात फार. बालविवाहांना शिक्षा ठोठावणारे कायदे आज जारी आहेत, तरीही त्यांचे हे व्यसन आजही लपूनछपून चालूच आहे. लग्नाशिवाय माणसाची माणुसकीच ठरत नाही, असा त्या अडाण्यांचा समज. ही लग्ने तरी थोड्या खर्चात, अंथरूण पाहून पाय पसरण्याच्या बाताबेताने करतील तर हराम! घरची कितीही गरिबी असो, सकाळ गेली संध्याकाळची पंचाईत असो, लग्नाचा थाट सरदारी दिमाखाचा उडालाच पाहिजे. तेवढ्यासाठी परवा नाही शेतभात गाडीघोडा ढोरंगुरं टक्के करून सावकाराच्या घरात गेली तरी बेहत्तर, पण लग्नाचा थाट दणक्या खणक्याचा झालाच पाहिजे, या फंदाने महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग जेवढा कर्जबाजारी होऊन भिकेला लागला, तेवढे इतर कोणत्याही व्यसनाने त्याच्या जीवनाचे कोळसे केलेले नसतील.
सखूबाई नि डेबूजींची अवस्था काय विचारता? ना बिस्तर ना बाड, देवळी बिऱ्हाड. आजोबा मामाचा आश्रय मिळाला नसता तर सखूबाईला हातात पोर घेऊन गावोगाव भीकच मागावी लागली असती. जात जमातीला सगळ्याना हे माहीत होते. अशा ना घर ना दार पोराला कोण देतो आपली मुलगी? सोयरा बघायचा तो त्याच्या घरदार शेतीवाडीवरून पसंत करायचा. मग ते घरदार शेतीवाडी तीन सावकारांकडे सहा वेळा गहाण पडलेली का असे ना. त्याची पर्वा कोणी करीत नसे. इतकेच नव्हे तर जवळ कवडी दमडी नसताही, लग्नाच्या थाटाने सोयऱ्यांचे नि गावकऱ्यांचे डोळे दिपण्यासाठी खुद्द नवऱ्या मुलालाच एखाद्या सावकाराकडे ७-८ वर्षाच्या मुदतबंदीने पोटावारी कामासाठी कायम बांधून दिल्याचा करारनामा करतात आणि लग्नासाठी पैसा काढून तो उधळतात. असे खेडूतांचे नाना छंद असतात. त्यापायी खेडीच्या खेडी गुजर मारवाडी पठाण सावकारांच्या घशात जाऊन, मऱ्हाठा शेतकरी पिकल्या मळ्यावर पोट बांधून सावकाराचा गुलाम बनला तरी या अडाणी लोकांचे डोळे अजून उघडत नाहीत.
काय पाहून मुलगी द्यायची?
‘डेबूजी माझा नातू, चंद्रभानजीचा भाचा, त्याची कर्तबगारी पंचक्रोशीत सगळ्यांना ठावी, मग त्याची सोयरीक जमायला हरकत कसली? शब्द टाकायची थातड, पाहुण्यांची वरदळ लागेल आमच्या आंगणात,’ हा हंबीररावाचा नि चंद्रभानजीचा भ्रम थोड्याच दिवसात दूर झाला. `मुलगा चांगला आहे हो, पण त्याचे काय पाहून आम्ही मुलगी द्यावी? ना जमीन ना जुमला. ना घर ना दार`. येई तो पाव्हणा हाच नकार देऊन चालता होऊ लागला. मानी माणसाला नकार सहन होत नाहीत, चंद्रभानजी म्हणजे दापुरीतला एक पुढारी शेतकरी. गावात त्याचा शब्द खाली पडत नसे. नकारानी पाणथळून न जाता, त्याने खटपटींचा जोर वाढवला आणि कमालपूर येथील धनाजी परटावर आपले वजन पाडले. त्याला मुलगा पसंत पडला. पण त्याची बायको काही केल्या रुकार देई ना. हो ना करता सन १८९२ साली डेबूजीचे लग्न हंबीररावच्या घरी थाटात साजरे झाले. घरात सौ. कुंताबाई सून आल्यामुळे, सखुबाईच्या वठलेल्या जीवनाला पालवी फुटली.
चंद्रभानजीवर सावकारी पाश
सुखवस्तु घरंदाजांवर कर्जाचे पाश टाकण्याच्या सावकारी युक्ता जुक्त्या अनेक असतात. तशाच तो सुखवस्तु नाक्षर आणि मानपानाला हपापलेला असला तर सावकारी कसबात तो तेव्हास नकळत अडकला जातो. दापुरे गावच्या शिवाराच्या पूर्वेला पूर्णानदीच्या काठी बनाजी प्रीथमजी तिडके नावाच्या सावकाराचा एक ५ एकर जमिनीचा सलग तुकडा होता. जमीन होती उत्तम; पण तिची ठेवावी तशी निगा न ठेवल्यामुळे ती नादुरुस्त नापीक झाली होती. तिडके सावकाराने तो तुकडा चंद्रभानजीला विकला. विकत घेताना काही रक्कम रोख दिली नि बाकीची रक्कम दोन वर्षात हप्त्याने फेडण्याचे ठरले. मात्र या खरेदीचा वाजवी कागद रजिस्टर केला नाही. "कागदा शिवाय अडलं आहे थोडंच? जमीन एकदा दिली ती दिली. माणसाची जबान म्हणून काही आहे का नाही?" असल्या सबबीवर कागद आज करू उद्या करू यावरच दिवस गेले.
दोन वर्षात डेबूजीने त्या जमिनीची उत्तम मशागत करून ती सोन्याचा तुकडा बनवली. दोन वर्षांत देण्याचे हप्तेही फेडले. तो सावकार चंद्रभानजीला हवे तेव्हा हव्या त्या रकमा नुसत्या निरोपावर देत गेला. त्या सावकाराच्या इतर कुळांच्या देण्याघेण्याच्या भानगडी चंद्रभानजीच्या सल्ल्याशिवाय मिटेनाशा झाल्या. सावकाराने त्याच्यावर आपल्या विश्वासाची एवढी मोहिनी टाकली का चंद्रभानजीच्या शब्दाशिवाय सावकार कोणाचे ऐकेनासे झाला. भोळसट चंद्रभानजी गर्वाने फुगला. स्वतःची श्रीमंती लोकांना दाखवण्यासाठी कुळधर्म देवकार्य उत्सव मेजवान्यांचा थाट उडवण्यासाठी तिडक्याकडून रातबेरात वाटेल त्या रकमा मागवीत गेला. तिडक्याची तिजोरी आपलीच गंगाजळी असा जरी त्याला भ्रम झाला, तरी तिडके होता जातीचा सावकार. त्याने एकूणेक रकमेचा जमाखर्च लिहून ठेवला होता. एक दिवस तो त्याने चंद्रभानजीला गमती गमतीने दाखवला आणि या भरंसाट कर्जाच्या फेडीसाठी दे आपली सारी जमीन खरेदी लिहून, असा पेच टाकला. चंद्रभानजीचे डोळे खडाड उघडले. त्याच्या डोळ्यापुढे अंधारीच आली. सावकारी सापळा कसा असतो ते त्याला आज उमगले. त्याने ५६ एकर जमीन गहाण लिहून खत रजिस्टर करून दिल्यावरच घरी परतायची त्याला मुभा मिळाली.
सावकारशाहीची जादू
डेबूजीला किंवा घरात कोणालाही ही गहाणाची भानगड चटकन उमगली नाही. शेताचे धान्य कपाशीचे पीक तर घरात महामूर येते, पण सावकाराचे लोक येऊन ते उघड्या डोळ्यांसमोर घेऊन जातात कां नि कशाला? याचा डेबूजीला बरेच दिवस काही थांगच लागेना. घरासमोर कपाशीचा पर्वत उभा रहावा. धान्यांचे डोंगर एकावर एक चढावे आणि एखाद्या दिवशी उठून पहावे तर आंगण मोकळे! अखेर चंद्रभानजीच्या गहाणांचे बेण्ड गावात फुटले. गावातहि कुजबूज उठली. घरंदाज म्हणून मिरवणाऱ्या शेतकरी पुढाऱ्याची जमीन गहाण पडणे ही मोठी नामुष्कीची गोष्ट. वरचेवर सावकाराकडून रोख रकमा उचलता येईनाशा झाल्यामुळे, खर्चासाठी रोकड रकमांची तंगी पडू लागली. अंगावरचा नित्याच्या खिडूकमिडूक दागिन्यांशिवाय बासनातले ठळक नग दूरगावी नेऊन त्यांचे टक्के करण्याचा चंद्रभानजीने तडाका चालू केला. त्याची प्रकृतीहि ढासळत गेली. अखेर विपत्तीची विषारी नजर गोठ्यातल्या गोधनाकडे वळली.
डेबूजीचे गोधनावरचे प्रेम
डेबूजीच्या चरित्राचा श्रीगणेशाच गोधनाच्या संगतीत नि गोसेवेच्या संगीतात झाल्यामुळे, ज्याचे बैल उत्तम त्याची शेती उत्तम हे तत्त्व त्याच्या मनावर खोल कोरले गेलेले होते. गोरक्षणाचे मूळ बीजच त्याने हेरले होते. औताच्या बैलांची तर तो स्वतःच्या प्राणापलीकडे निगा ठेवीत असे. गायीला गोऱ्हा झाला का डेबूजी त्या गाईला धार काढायचा नाही. सारे दूध गोह्याला पिऊ द्यायचा. कोणाला काढूही द्यायचा नाही. लहानपणी गोऱ्ह्यांना भरपूर दूध मिळाले म्हणजे ते पुढे हाडापेराने बळकट ताकदवान बनतात. अशा २-३ खोंडाना भरपूर दूध पाहून त्याने नमुनेदार बैल बनवले होते.
सावकारशाहीच्या पोखरणीचे गिरमिट लागलेल्या चंद्रभानजीने गोऱ्हे विकण्याचा प्रश्न काढताच डेबूजीने जीव देईन; पण माझे खोंड विकू देणार नाही, असा खडखडीत प्रतिकार केला. खोंड नाही तर म्हातारा बैल तरी विकला पाहिजे, असा आग्रह पडताच, डेबूजीने करड्या आवाजात आजोबाला नि मामाला बजावले "दोनच का तीनही गोऱ्हे टाका विकून. पण त्या म्हाताऱ्या बैलाला मी विकू देणार नाही. जन्मभर त्याने तुमचे काबाडकष्ट केले. हज्जारो रुपयांचे धान्य पिकवले. तुमच्या श्रीमंतीचा बडेजाव संभाळला. पोटच्या पोरासारखा आजवर त्याला पाळला, पोसला नि राखला. आज तो म्हातारा झाला म्हणून काय त्याला कसायाला विकणार तुम्ही? ही काय माणुसकी झाली? म्हाताऱ्या बैलाप्रमाणे उद्या म्हाताऱ्या माणसांचीही अडगळ घरातनं काढायला लोक सबकतील, तर त्यांचे हात कोण धरणार? तो बैल विकाल तर उद्यापासून मी औताला जाणार नाही, मला घरात ठेवा नाहीतर हुसकून द्या. कुठेही चार घरं भीक मागून पोट भरीन, पण असला कसायीखाना मला परवडणार नाही."
मामा, घाबरता कशाला?
डेबूजीचे म्हणणे कितीही खरे असले तरी त्याने कर्जाचा बिनबुडाचा खळगा थोडाच भरणार होता? चंद्रभानजी तर अगदी टेकीला आला. डेबूजीने त्याला धीर देण्याचा खूप यत्न केला. तो म्हणाला, “मामा, आपण उपाशी राहू. आंगभर कपडा घालणार नाही. सणवार करणार नाही. मुलांबाळांसह खूप कष्ट करू आणि आपल्या मायपोट शेतीच्या पिकांवर या सावकारी पाशातून मोकळे होऊ. पण यापुढे त्या सावकार यमाची पायरी चढणार नाही अशी शपथ घ्या. खोटेनाटे हिशोब ठेवून त्यानं तुम्हाला सपशेल फसवलंय. चांगल्या हिशेबी माणसाकडून त्याचे हिशोब तपासून घ्या नि खोट्यानाट्याची सरकारात फिर्याद लावा. बाकीचे मी पाहून घेतो."
झालंय कधी असं?
फिर्याद? कुळाने सावकारावर लावायची? खोट्या हिशेबाबद्दल? झालंय कधी असं? शेतकऱ्याचे म्हणणे कितीहि खरे असले, तरी न्यायमंदिरात कागदाची जबानी खरी ठरत असते. आणि कागदांवरच्या आकड्यातच सावकारी कोलदांड्याची सारी शहामत सामावलेली असते. सावकारी आकडेमोडीमुळे चांगले शिकले सवरलेले शहाणे कोर्टात गाढव ठरतात. तिथे जन्माचे अडाणी नि नाक्षर अशा नांगरगट्यांचा काय पाड
कर्जफेडीसाठी शेती उमाप पिकवण्याचा डेबूजीचा अट्टहास चालू असतानाच, चंद्रभानजी ताप घेऊन झुरणीला लागला आणि थोड्याच दिवसात मरण पावला. हंबीररावचे घरच बसले. घरात विधवा सून नि एक लहान नातू बळीराम. सगळा भार डेबूजीवर पडला.
शेतकरी छोटा ना मोठा
आकाश कोसळून पडले तरी डगमगायचे नाही. खोट्यानाट्याचा मुलाजा राखायचा नाही. हा डेबूजीच्या स्वभावातला एक महान गुणधर्म आजही त्याच्या चारित्र्याचा एक तेजस्वी पैलू म्हणून सांगता येतो. आता शेतावर सखुबाई, मामी, आजा, आजी, बळीराम आणि कुंताबाई सगळेच जातीने काम करू लागले. कपाशी वेचायला, ज्वारी कापायला, काय वाटेल ते काम करायला सगळे घर एकजुटीने लागल्यामुळे, डेबूजी वट्टीची शेती दापुरे पंचक्रोशीत नमुनेदार म्हणून सगळ्यांच्या नजरेत भरण्यासारखी पिकायची. आजवर गडी नोकरांकडून शेती करवली. आता आपण स्वतः कसे राबायचे? असला किंतू आजा आजी मामी आईच्या मनात डोकावू लागताच, डेबूजी म्हणाला, "शेतकरी कधी मोठा नसतो नि छोटापण नसतो. तो फक्त शेतकरीच असतो, शेतीच्या मातीत कष्ट करावे नि मातीतून सोने काढावे, एवढेच त्याचे काम, तोच त्याचा धर्म नि जमीन त्याचा देव, बाकीचे सारे देव धर्माचे चोचले थोतांडी, श्रीमंत गरिबीचे काय घेऊन बसलात? ढगाची साळवटं ती. येतान नि जातात. श्रीमंतीची मिजास कशाला नि गरिबीची लाज कशाला? मनगटं घासून कामं करावी. मिळेल तो ओला कोरडा घास अभिमानाने खावा आणि जगात मान वर करून वागावे. पूर्वी आपण कसे होतो नि आज कसे झालो, हव्यात कशाला शेतकऱ्याला त्या भानगडी?"
मेहनती दिलगीर, चोरटे हुशार
सालोसाल शेती पिकवावी आणि सावकाराने कर्जाच्या पोटी कापूस धान्यांचे पर्वत डोळ्यादेखत उचलून न्यावे. वर्षभर काबाडकष्ट करून अखेर पदरात काय, तर खळ्याच्या मातीत पुरलेले नि उरलेले धान्याचे दाणे टिपावे, नदीत नेऊन धुवावे आणि पोटासाठी घरी आणावे. करडीचे मातेरे स्वच्छ करून त्याचे घरीच तेल काढावे. धड दिवठणाला पुरायचे नाही ते, तर खायला कुठचे? म्हातारा हंबीरराव खचत चालला ही अवस्था पाहून. डेबूजी त्याची समजूत घालायचा. "हे पहा आबाजी, आधी आपण सावकाराच्या पेचातून मोकळे होऊ या. मग तेल तूप काय वाटेल ते खाऊ. पण जोवर ही कर्जाची अवदसा आपल्या मानेवर आहे तोवर अमृत खाल्ले तरी अंगी लागणार नाही."
जगात मोठा साधू कोण?
घरात मनस्वी कष्ट असतानाही डेबूजी बैलांच्या दाणावैरणीचे हाल चुकूनसुद्धा होऊ द्यायचा नाही. आपण उपाशी रहावे; पण ज्यांच्या मेहनतीवर आपली शेती पिकते, त्या मुक्या जनावरांचा घास तोडू नये, हा सिद्धांत त्याने कसोशीने पाळला. बैलाना तो जगातले खरे संत साधु म्हणून पूज्य मानायचा, त्याना धुऊन पुसून गोंजारल्यावर तो त्याना दोन हात जोडून पूज्य भावाने नमस्कार करायचा. शेती किंवा शेतकरी यांच्यापेक्षा जगावर बैलांचे उपकार फार मोठे आहेत. रात्रंदिवस कष्ट करून जो जगला अन्न देतो, सुख देतो, तोच खरा साधू हा डेबूजीच्या मनीचा भाव आजहि त्याच्या चरित्रात अपरंपार उफाळलेला दिसून येतो.
बाप दाखव, नाहीतर...
डेबूजी नाक्षर खरा, पण त्याची व्यवहारी नजर, मोठी चोख आणि करडी. पीक काढले किती, सावकाराने नेले किती, त्याची चालू भावाने किंमत किती, याचा बिनचूक अंदाज बांधून, त्याने तिडके सावकाराची भेट घेतली आणि हिशेब दाखवा आणि पावती करा, असा आग्रह केला. त्याने अनेक थापा दिल्या, होय होय म्हटले, सबबी सांगितल्या, पण हिशेबाचा किंवा पावतीचा थांग लागू दिला नाही. मामाचे सगळे कर्ज व्याजासकट फिटून उलट तुमच्याकडेच आमची बाकी निघते, असा डेबूजीने उलटा पेच मारला. पुष्कळ दिवस अशी माथेफोड केल्यावर, एक दिवस डेबूजीने त्याला सरळ हटकले. "हिशेब दाखवून फेडीची पावती देत नसशील, तर यापुढे तुला एक दाणा देणार नाही. शेतावर आलास तर तंगडी छाटून लंबा करीन, याद राख. गाठ या डेबूजी वट्टीशी आहे. भोळसट चंद्रभानजी मामाशी नाही."
आलाच अखेर तो प्रसंग
सावकाराने हिशेबाच्या आकड्यांची उलटापालट करून सगळी शेती गिळंकृत करणारा कर्जाचा आकडा डेबूजीपुढे टाकला. हा खोटा आहे. मी मानीत नाही, असा त्याने करडा जबाब दिला. उद्या आणतो तुझ्या साऱ्या शेत जमिनीवर टाच, असा सावकाराने दम भरला. ठीक आहे, आणून तर पहा. असा सडेतोड जबाब देऊन डेबूजी परतला. वाटेत पूर्णानदीच्या काठाच्या त्या जमिनीजवळ येताच त्याला ब्रह्मांड आठवले. "ही माझी जमीन, माझी लक्ष्मी, इतक्या वरसं सेवा केली हिची आम्ही सगळ्यांनी. घामाबरोबर चरबी गाळली आणि उद्या तो सावकार कायदेबाजीने हिसकावून घेणार काय आमच्या हातातनं? पहातो कसा घेतो ते."
सगळी जमीन सावकाराच्या घरात जाणार, ही बातमी कळताच हंबीररावच्या घरात रडारड झाली. डेबूजीने धीर देण्याचा खूप यत्न केला. मूळचा जरी तो नाक्षर तरी व्यवहाराच्या टक्क्याटोणप्यानी त्याला मिळालेले व्यवहाराचे ज्ञान पढिक पंडितांच्या शहाणपणापेक्षा अधिक कसदार होते. "माझी बाजू सत्याची नि न्यायाची आहे. सावकारशाही नि कायदेबाजी कितीही धूर्त नि चाणाक्ष असली तरीही मी त्यांना पुरुन उरेन. अन्यायाचा प्रतिकार काय नुसत्या कोर्टबाजीनेच करता येतो? शेताची माती कसण्यात कसदार बनलेल्या माझ्या पीळदार मनगटाचा काहीच का उपयोग होणार नाही? पैसेवाल्यानी कोर्ट कचेऱ्याच्या पायऱ्या चढाव्या आणि गोरगरिबांनी समोरासमोर ठोशानी न्यायाचा ठाव घ्यावा." इतक्या कडेलोटावर त्याची विचारसरणी गरगरू लागली.
पांचशे कोसात सावकाराचा दरारा
सोनाजी राऊत नावाच्या वजनदार शेजाऱ्याने डेबूजीला समजावण्याची वजनदार खटपट केली. तो म्हणाला “डेबूजी, ही भल्याची दुनिया नाही रे बाबा. सतीच्या घरी बत्ती नि शिंदळीच्या दारी झुले हत्ती. वाघाच्या तडाख्यातनं माणूस एकदा वेळ शीरसलामत वाचेल, पण सावकारी कचाट्यातनं? छे! नाव काढू नकोस. तशात हा सावकार म्हणजे महा कर्दनकाळ. पांचशे कोसांत याचा दरारा. गाभणी गाभ टाकते."
डेबूजी : अरे मोठा वाघ का असे ना तो, चौदा वरसं शेत आमच्या वहिवाटीत आहे. मी नाही त्याला कबजा येऊ देणार. वेळच पडली तर अस्तन्या वर सारून करीन काय वाटेल ते.
सोनाजी : डेबूजी, हा आततायीपणा काही कामाला येणार नाही. अरे, खैरी गावचे नि आपल्या इथले जाठ लोक म्हंजे वाघाची जात. त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवायची प्राज्ञा नाही कुणाची. पण या सावकारानं त्यांचीही हड्डी पिळून मळून त्याना गोगलगाय करून टाकलंय. पहातोस ना! मग तुझा एकट्याचा रे काय पाड? तुझ्यामागं आहे कोण? येणार कोण? या भानगडीत तू पडू नये हे बरं.
म्हाताऱ्या हंबीररावनेही सोनाजीच्या उपदेशाला पाठिंबा दिला. "पोरा, काय चालवलंयस हे तू. शेताचा कबजा घ्यायला सावकार उद्या आला तर येऊ दे. काय वाटेल ते करू दे. त्याला आडवा जाऊ नकोस. शपथ आहे माझ्या गळ्याची. या गावात आपल्या बाजूचे कुणी नाही. घरात दातावर मारायला तांब्याचा दमडा नाही. कशाला घेतोस बाबा समर्थाशी होड? व्हायचं असंल ते होऊ दे. आपण बोलून चालून परीट. जिकडे भरला दरा तो गाव बरा समजून हवं तिथं जाऊ, कुठंहि दोन कपडे धुऊन पोट भरू, पण या सावकाराला आडवा जाऊ नको रे बाबा."
धरा त्याला... काढा बाहेर
डेबूजी वट्टीच्या शेतात सावकार आज नांगर घालून कबजा घेणार, या बातमीने आसपासचा सारा शेतकरी त्या शेताच्या आजूबाजूला जमा झाला. डेबूजी मोठ्या पहाटेलाच शेतावर नेला. मागोमाग हंबीरराव सखुबाई वगैरे मंडळी धावली. इतक्यात ८ च्या सुमाराला महाशय तिडके सावकार घोड्यावर स्वार होऊन दाखल झाले. ७-८ औत, बैल, नांगरे, ९-१० तगडे कजाखी नोकर बरोबर होते. "जुंपा रे आपले बैल. घाला शेतात नांगर आणि तो कोण नांगरतो आहे तिथे, त्याला गचांडी मारून बाहेर काढा." सावकाराने आरोळी दिली. आजूबाजूच्या या भानगडीकडे मुळीच लक्ष न देता, डेबूजी आपला नांगर खाली मान घालून चालवीत होता. "अरे पाहता काय घाला त्याच्या कंबरेत लाथ नि द्या फेकून हद्दीबाहेर." सावकार पुन्हा गरजला, हंबीरराव व सखूबाईने रडकुंडी येऊन डेबूजीला बाहेर काढण्याचा खूप त्रागा केला. पण हूं का चूं न करता तो नांगर चालवीतच राहिला. “धरा त्याला, काढा बाहेर," या सावकाराच्या आरोळ्या चालल्याच होत्या. अखेर त्याने हनमंत्या महाराला "हनमंत्या, हो पुढे. घे हिसकावून तो औत. मार त्या चोराला गचांडी नि काढ शेताबाहेर. असा निर्वाणीचा हुकूम केला."
जा गुमान मागं, नाहीतर
हनमंत्या पुढे सरसावला. डेबूजीने त्याला डोळ्याला डोळा भिडवला. आगीच्या ठिणग्या पडत होत्या त्या इंगळी लाल डोळ्यांतून. "हनमंत्या" डेबूजी गरजला. "तुझ्या जिवाची तुला पर्वा नसेल, पोराबाळांची आशा नसेल, तरच पाऊल टाक पुढं. मी झालोय आता जिवावर उदार. काळाची मुंडी पिरगाळून टाकीन, तुझी रे कथा काय? एक पाऊल सरकलं पुढंका मेलास समज तू. तुझ्यामागे तुझ्या पोराबाळांना देईल का रे हा जुलमी सावकार शेरभर धान्य? जा गुलामन मार्ग, नाहीतर गाठ आहे माझ्याशी." हनमंत्या कचकला नि जागच्या जागी थबकून उभा राहिला.
सावकाराच्या संतापाचा पारा भडकला. त्याने दोन तगडे जाठ डेबूजीच्या आंगावर सोडले. दोनी बगला एकदम पकडून त्यांनी डेबूजीचा नांगर खाली पाडला. हंबीरराव सखुबाईने रड्याचा आकांत केला. डेबूजीने एका हिसड्यात एका जाठाला कोपरखळीच्या तडाख्याने पच्कन खाली विव्हळत बसवले आणि दुसऱ्याच्या पोटात लाथेची ठोकर मारून जमिनीवर पालथा लोळवला. झट्कन त्याने नांगराचा तुल्या (साडेतीन हात लांबीची लोखंडाची कांब) हातात घेऊन थेट सावकारावर चाल केली. “आज मी मरेन किंवा तुझ्या नरडीचा घोट घेईन. कसा घरी जिवंत जातोस ते पहातो आता मी, अशी भयंकर गर्जना करून डेबूजी धावला." सावकार भेदरला.
घोड्याचा लगाम खेचून तो परतायला वळतो न् वळतो तोच डेबूजीच्या तुत्याचा तडाखा तडाड बसला घोड्याच्या पुठ्ठ्यावर. घोडा उधळला. सावकाराचे पागोटे गेले गडगडत गरगरत शेताच्या मातीत. मालक महाराज जीव घेऊन पसार झालेले पहाताच, बरोबरच सारे नांगरे गडी नि जाठ सुद्धा भेदरले. "जाता का नाही इथनं सारे? जीव घेईन एकेकाचा. सोडणार नाही." डेबूजीचा त्या वेळेचा तो रुद्रावतार पाहून बच्यांचीही तिरपीट उडाली. "माझ्या शेतात पाऊल टाकण्यापूर्वी घरच्या बायकांची कुंकवं पुसून या मर्दानो," ही शेवटची गर्जना ऐकताच एकजात सगळ्यानी भराभर पोबारा केला. डेबूजीने नांगर घेतला नि जसे काही कुठे झालेच नाही, अशा वृत्तीने नांगरणी पुढे चालू केली.
अनि म्यां ब्रह्म पाहिले
यमाचा काळदण्ड सावित्रीने आपल्या स्वयंभू तेजाने जसा अचानक परतवला, तसलाच प्रकार हंबीररावच्या डेबूजी नातवाने केलेला पहाताच सावकारशाही वचकाचा शेकडो वर्षांचा फुगाच फुटला. अरेच्चा, सावकाराला असा आडवून तुडवताही येतो म्हणायचे? हा नवाचा पायंडा डेबूजीने वऱ्हाडच्या शेतकरी जनतेला प्रथमच शिकवला. विचारा तिडके सावकारही सपशेल पाणथळला. डेबूजीचे उदाहरण उद्या बाकीच्या शेतकरी कुळालनी गिरवले तर आपले काय होणार? या भीतीने त्याच्या तोंडचे पाणी पळाले. डेबूजीला आवरा म्हणून उपदेश करणारी मंडळीच आता त्याची पाठ थोपटायला हंबीररावाकडे धावली. माणसांतला कर्दनकाळ म्हणून पिढ्यान्पिढ्या गाजलेला सावकारांचा दरारा डेबूजीने एकाच थपडीत मातीमोल केल्यामुळे, पुढे तडजोडीचा मार्गच बंद झाला. दापुरी गावात यायलाही त्याला तोंड राहिले नाही.
काही दिवस गेल्यावर, तिडके सावकाराने मध्यस्थांची परवड घालून डेबूजीशी तडजोड करण्याची खूप तंगडझाड केली. “ज्याचा दाम खोटा असेल त्याने सावकाराच्या कोर्टकचेरीच्या दरडावणीला भ्यावे. माझा हिशेब उघडा नि चोख आहे. वसूल घेतो नि पावती देत नाही? हिशेब दाखवित नाही? पटवीत नाही? आणि गुमान येतो जमीन कबजा घ्यायला? त्या जमिनीचे मामानी रोख पैसे दिले तरी खरेदीखत केले नाही. काय, कायद्याला डोळे आहेत का फुटले? कायदा काय अशा चोरांना पाठीशी घालतो होय? जा म्हणावं तुला काय करायचं असेल ते करून घे. आम्ही त्याची एक दिडकी लागत नाही." डेबूजीच्या या बोलण्याला कोणालाहि खोटे पाडता येऊ ना.
अखेर मूळ मालक म्हातारा हंबीरराव याला कसाबसा मथवून, सावकाराने गहाण जमिनीपैकी १५ एकर जमीन परत देऊन, आता काहीहि देणे राहिले नाही, अशी दुकानपावती देऊन वांधा मिटवला. हंबीरराव सखुबाईला आनंद झाला, पण "तुमचे तुम्ही मालक आहात. मी एक तसूभरसुद्धा तुकडा त्याला दिला नसता.” हे डेबूजीचे तुणतुणे कायम राहिले.
उपाशी रहा; पण कर्ज काढून सावकाराच्या जाळ्यात अडकू नकारे बाबांनो, ही गाडगेबाबांची प्रत्येक कीर्तनातली आरोळी लक्षावधि लोकांनी आजवर ऐकली नि रोज ऐकतात. तिच्यामागे हा जुना इतिहास आहे, हे त्यांना आता तरी नीट उमजावे म्हणून या कथेचा किंचित विस्तार करून सांगितली.
डेबूजीचा देवीसिंग झाला
सावकार - सापाचे नरडे दाबून सर्वस्वाचा मणि त्याच्या मस्तकातून खेचून काढण्याच्या अपूर्व यशाने दुपारी पंचक्रोशीत डेबूजीला गावकरी नि शेतकरी मोठा मान देऊ लागले. ते आता त्याला देवीसिंग या बहुमानवाचक नावाने संबोधू लागले. एक वर्षातच हंबीररावच्या घराण्याची कळा बदलली. कपाशी ज्वारी गहू जवसी करडी तुरीचे पीरही महामूर आले. अंदाजे एक हजार रुपयांची लक्ष्मी घरात आली. आंगणात धान्यांचे कणगे उभे राहिले. धनधान्य कपडालता दूधदुभते यांची चंगळ उडाली. गावकीच्या हरएक भानगडीत लोक डेबूजीला सल्लामसलतीसाठी मानाने बोलवायचे. या बदलामुळे डेबूजी गर्वाने ताठून न जाता, उलट पहिल्यापेक्षा अधिकाधिक विनम्र होत गेला. सहज नुसती कोणी हाक मारली तरी नमस्कार करून, "काय आपली आज्ञा आहे." अशा लीनतेने तो वागायचा.
गावात येणाऱ्या भिकाऱ्या दुकाऱ्यांची, संत गोसाव्यांची, भजनं कीर्तनकारांची विचारपूस करून त्यांच्या सर्व गरजा भागवायचा. आपण जे श्रम करून कमावतो, त्यात गोरगरिबांचा नि गरजू लोकांचा भाग असतोच असतो. आपण घास घेण्यापूर्वी घरचे दारचे ढोर कुत्रे मांजरसुद्धा उपाशी राहता कामा नये. आधी दारचे अतिथी अभ्यागत यांची सोय नि मग आपण. देवाला नैवेद्य दाखवायचा तो असाच दाखवला पाहिजे. ही त्याच्या मनीची भावना असे. सुबत्ता आली म्हणून त्याच्या शेतीच्या कष्टात हयगय झाली नाही. उलट, आजा आजी, मामी, आई यांसह कामाचा जोर वाढवला. आताही हा शेतीसाठी नोकर कां ठेवीत नाही, याचेच लोकांना नवल वाटायचे.
अन्यायाची चीड
गावात नामसप्ताह व्हायचे. आंधळे पांगळे आणि अस्पृश्य यांच्या टोळ्यांच्या टोळ्या अन्नासाठी गावागावाहून धावायच्या. नेहमीचा प्रघात काय, तर सगळ्यांची जेवणे झाल्यावर उरलेले खरकटे उष्टे अन्न त्या अन्नार्थी गरिबांवर दुरून झुगारायचे. डेबूजीला हा किळसवाणा बेमाणुसकीचा प्रकार सहन झाला नाही. देवाचा महाप्रसाद नीटनेटका स्वच्छ असा आपणच गावकऱ्यांनी तेवढा खावा आणि त्या गोरगरिबांच्या नशिबी काय खरकटे उष्टे असावे? चांगले गोडधोड आपल्याला मिळाव असं त्यांना वाटत नाही होय? त्यांना खरकटे चारण्याचा काय अधिकार आहे आपल्याला? ते काही चालणार नाही. गावकीचा महाप्रसाद त्यांना नीट पंगतीला बसवून तुम्ही खाऊ घालीत नसाल तर मी तुमच्यात भाग घेणार नाही. माझ्या घरी निराळा सैंपाक करून मी त्यांची हवी तशी सोय लावीन आणि स्वतः त्यांच्या पंगतीला बसून प्रसाद भक्षण करीन, असा सडेतोड खुलासा करताच गावकऱ्यांचे डोळे उघडले. लोकांची कांकू पहाताच डेबूजीने आपल्या घरी ताबडतोब चांगल्या पक्वान्नांचा बेत करून सर्व जमलेल्या अंध, पंगू, महारोगी आणि अस्पृश्य बांधवांना घरच्या आंगणात पंक्तीने बसवून पोटभर जेवू घातले. विचारवंत म्हातारेकोतारे म्हणू लागले, “अरे हा डेबूजी आपल्यातला एकनाथ आहे रे एकनाथ."
आता काय? मटण दारूची चंगळ!
डेबूजीचे साधुतुल्य चरित्र आणि चारित्र्य पंचक्रोशीत गाजत वाजत असतानाच सौ. कुंताबाई बाळंत होऊन तिला मुलगी झाली. सखुबाईला पृथ्वीवर स्वर्गच आल्यासारखे वाटले. मुलाच्या बाजूने नाही तर मुलीच्या बाजूने पणतवंडाचे तोंड पाहिले म्हणून म्हातारा हंबीरराव नि रायजाबाई आनंदाने नाचू लागले. डेबूजीला मुलगी झाल्याची बातमी पंचक्रोशीत फैलावताच, गोतावळ्या जमातवाल्यांच्या तोंडाला पाणी सुटले. आता काय! बारशाच्या दिवशी डेबूजीकडे मटण दारूचे पाट वहाणार! या आशेने जो तो आमंत्रणाची वाट पाहू लागला.
परटाच्या आयुष्यात तीन बळी
ही एक म्हणच प्रचारात होती. गरीब असो वा कोणी असो, जन्म लग्न नि मरतिकीच्या प्रसंगी बोकडाची कंदुरी आणि मनमुराद दारू जातगोतवाल्यांना दिल्याशिवाय चालतच नसे. मोठ्ठा जातधर्मच होता तो. कर्ज काढून, भीक मागून हे देवकार्य करावेच लागे. न करील तो पडलाच वाळीत.
रूढीप्रमाणे हंबीररावने बोकडाची कंदुरी नि दारूचा बेत ठरवला. त्याचा घरात खल होताना सखुबाई कुरकुरू लागली. तिला आपल्या नवऱ्याचे मरणकालचे ते शब्द आठवू लागले. त्या सगळ्या दुर्दैवी घटनांचा चित्रपट तिच्या डोळ्यांपुढे भराभर सरकू लागला. डेबूजीच्या कानावर हा बेत जाताच त्याने तडाड नकार दिला. "आजवर आपल्या घरात चुकूनसुद्धा जे आपण कधी केलं नाही, ते काय आज करणार? भले जातगोतवाले रागावले तर प्रसंगाला आले का कुणी आमच्या? आमचे आम्हालाच निपटावे लागले ना? बारशाला मटण दाम द्यावी, असं कुठच्या धर्मात सांगितलंय? जगावेगळा धर्म आहे हा. मला नाही तो पसंत. आपल्या घरात मटण दारू बंद, कायमची बंद. काही चांगलं गोडधोड करून घालू गोतावळ्याना मेजवानी."
जातकुळीला बट्टा लावलात तुम्ही
गोतावळी मंडळी जमली. पाने वाढली. पण दारूचा वास तर कुठेव येत नाही? हे काय? पानावर पहातात तो बुंदीचे लाडू बाढलेले! एक पुढारी गरजले, “काय हो हंबीरराव, हा काय जगावेगळा प्रकार? बारशाला बुंदीचे लाडू? मटण दारू नाही? जातगोताची रूढी मोडता? आम्हाला नाही परवडणार असला अधर्म, जातकुळीला बट्टा लावतात तुम्ही. चला उठा रे. कोण असले जेवण जेवतो?" बिचारा हंबीरराव तर सर्दच पडला. डेबूजी पुढे सरसावला. पुढारी हुज्जत घालायला उठले त्याच्याशी. सगळेजण रागाने तापले होते. त्यांचा आवाज चढला होता. दारू मटणाच्या आशेने आलेल्या लोकांची निराशा भयंकर असते. खेडूतांत अशा प्रसंगी खूनहि पडतात. अगदी शांतपणे, पण निश्चयाने डेबूजी एकेक शब्द बोलू लागला. "बापहो, नीट ऐकून घ्या. तुम्ही म्हणता ती मटण दारूची रूढी धर्माची नाही. आपल्या अडाणीपणाची नि जिभलीच्या चोचल्याची आहे. आपले धर्मगुरू वामन. ते कधी मारतात का बकरा? पितात का दारू? बारशा लग्नाला नि मरतिकाच्या तेराव्यालासुद्धा ते गोडधोड पक्वांनांच्याच जेवणावळी घालतात. त्यांना धर्म माहीत नाही, असं का म्हणणं आहे तुमचं?"
पुढारी : बोकड मारला नाही, दारू पाजली नाही, तर मुले जगत नाहीत.
डेबूजी : कुणी सांगितलं राव तुम्हाला हे? तुमचं तुम्ही मनचंच ठरवलंय सगळं. मारवाडी गुजराती किती श्रीमंत असतात! खंडी दोखंडी बकरी मारण्याच्या ऐपतीचे असतात. त्यांनी कधी बोकडाची कंदुरी केली नाही. दारू पाजली नाही. म्हणून काय त्यांची मुलेबाळे जगली नाहीत? त्यांचा काय निर्वंश झाला? उलट कंदुरी दारूचे पाट वाहवणारे आपण पहा. काय आहे तुमच्या सगळ्यांची दशा? शेताच्या मातीत मर मर मरता, पण सकाळ गेली, संध्याकाळची पंचाईत. या मटण दारूच्या पायी घरेदारे शेतीवाड्या सावकारांच्या घरात नेऊन घातल्यात, तरी डोळे उघडत नाहीत. विचार करा मायबाप. भलभलत्या फंदाला धर्म समजून गरीब प्राण्यांची हत्या करू नका. जीव जन्माला आला का दुसऱ्या एका जीवाची हत्या आणि कुणी मेला तरीहि पुन्हा हत्याच! हा काय धर्म समजता? चला बसा पानांवर, चांगले गोडधोड पोटभर खा, आनंद करा नि घरोघर जा. मटण - दारूच्या व्यसनाने जमातीचे आजवर झाले तेवढे वाटोळे पुरे झाले. आता जरा माणसात येऊन माणुसकीने वागू या सगळे.
या शांत, पण कट्टर निश्चयी बोलण्याचा परिणाम चांगलाच झाला. एकालाहि त्याचे म्हणणे खोडून काढता येई ना. सगळे गोतावळे मुकाट्याने जेवले. मुलीच्या बारशाची ही बुंदीच्या लाडूंची मेजवानी दापुरीच्या पंचक्रोशीतच काय, पण हां हां म्हणता सगळीकडे फैलावली. वेळ प्रसंग पाहून लोकांच्या आचार-विचाराना धक्का देण्याच्या कुशलतेतच समाज-सुधारकाची खरी शहामत असते. गाडगेबाबांच्या चरित्रातला हा पैलू आजहि प्रखरतेने जनतेला दिसत असतो.
लोकसेवेचा प्रारंभ
शेतीवाडी धनत्तर पिकत आहे, गुराढोरांनी गोठा गजबजला आहे. चंद्रभानजीचा मुलगा आता वयात येऊन तोहि हाताशी काम करीत आहे, भरपूर पैसा घरात येत आहे, समाजात मान्यता वाढती आहे, अशा स्थितीतहि डेबूजी लोकहिताची कामे स्वयंसेवकी वृत्तीने करू लागला. नदीकाठचे रस्ते पावसाळ्यात नादुरुस्त झाले का ते खणून कुदळून नीट करायला कुदळ पावडे घेऊन डेबूजी स्वतः काम करीत रहायचा. लोकांना प्रथम आश्चर्य वाटे. पण अखेर लाज वाटून तेहि कामाला लागायचे. सार्वजनिक हिताची कामे सर्व जनांनी एकवटून केली पाहिजेत, हा धडा मिटल्या तोंडी त्याने गावकऱ्यांना शिकवला. कोठे घाण कचरा साचला का त्याने स्वतः जाऊन तो काढावा. कोणतेहि काम करताना गाजावाजा नाही, लेक्चरबाजी नाही, काही नाही. वाईट दिसले तेथे आपणहून चांगले करावे. त्यासाठी पदरमोडहि करावी. हा खाक्या. कोणाचे काही अडले नडले का स्वतः जाऊन ते सावरावे. डेबूजीच्या या वृत्तीमुळे सारे लोक त्याला हा कुणीतरी देवाचा अवतार आहे असे मानू लागले.
डेबूजीची आत्यंतिक भूतदया
वाटेने जाताना जरा कुठे कुणी संकटात अडचणीत पडलेले दिसले का डेबूजी धावलाच त्याच्या मदतीला. म्हाताऱ्या माणसाला लाकडाची गाठ फुटत नसली का त्याने ती फोडून द्यावी. ओझ्याखाली वाकलेल्या पोरवाल्या बाईचे ओझे आपल्या डोक्यावर घेऊन घरपोच न्यावे. चिखलात गाडी रुतली का ती जाऊन बाहेर काढावी. ना गर्व ना ताठा. वऱ्हाडात गाडीच्या बैलाना पराण्या टोचण्याचा प्रघात फार असे. डेबूजीने ते पाहिले का कळवळत त्या शेतकऱ्याला हटकायचा, "बाप्पा हे काय चालवलंयस? त्या मुक्या जनावराला ना येत बोलता ना रडता ना बोंबलता. तुला कुणी ही अरी भोसकली तर कसेरे वाटल तुला? मुक्या जनावरांचा असला छळ देवाघरी पाप आहे." वारंवार प्रत्येक ठिकाणी डेबूजीने अशी कानउघडणी केल्यामुळे, त्या पराणीच्या प्रघाताला आळा बसत गेला.
बैल किंवा गाय म्हातारी झाल्यावर निरुपयोगी जनावर म्हणून खुशाल उघड्या बाजारात कसायाला विकण्याचा धंदा फार चाले. "ज्या गोमातेने जन्मभर दूध देऊन तुमची नि तुमच्या पोराबाळांची पोटं भरली, तुमची हाडं सकस बलवान केली, शेतीला तगडे बैल दिले, शेणखत दिले, ती आता म्हातारी झाली म्हणून तुम्हाला पोसवत नाही काय? तिला कसायाला विकता आणि तिच्या हाडामासाचे टक्के घरात आणून पोटात घालता? काय तुम्ही माणसं का भुतं? तुम्हाला कोणी म्हातारपणी असंच विकलं अथवा घरातली नसती अडगळ म्हणून दिलं उकिरड्यावर टाकून, तर कसं बरं वाटल मनाला?" असा उपदेश करून तो त्या गोविक्रीला आडवायचा. सामोपचाराने कुणी ऐकले नाही तर आपल्या सवंगड्याच्या मदतीने थेट बाजारात जाऊन सौदा मोडायचा.
जनावरांना रोग झाला का अडाणी शेतकरी औषधोपचाराऐवजी ठराविक भगताला बोलावून देव खेळवायचे. तो भगत दारू ढोसून आंगारे धुपारे करीत त्या ढोराभोवती आरोळ्या मारमारून धिंगाणा घालायचा. ढोर बचावले तर भगताचा देव खरा. मेले तर आपले नशीब. "लई विलाज केला" म्हणत हळहळणाऱ्यांना डेबूजी धिक्काराने म्हनायचा, “अरे रोग म्हंजे रोग. तो हा देवघुमव्या भगत काय कपाळ बरा करणार? तो काय डोराचा डाक्टर आहे? तालुक्यात जावं, सरकारी डाक्टराचं औषध आणावं. तसाच बिकट प्रसंग आला तर ढोराला गाडीत घालून तिथं न्यावं. म्हणजे रीतसर विलाज होईल. या देव धुपारे नि दारूच्या बाटलीने काय होणार? झालंय का कधी जगात कुणाचं बरं यानी? ढोराबरोबर तुमचंहि वाटोळं होईल असल्या फंदानं."
संसारातून समाजाकडे
पहिली मुलगी अलोकानंतर २-२ वर्षांच्या अंतराने कलावति मुलगी आणि मुद्रल नावाचा मुलगा झाला. मुलगा थोड्याच दिवसात वारला. घरातल्या या भानगडी आई सखुबाई निपटायची. डेबूजी तिकडे ढुंकूनहि पहायचा नाही. शेती नि लोकसेवा यात तो अखंड गढलेला. जसजसे दिवस जात गेले, तसतसा त्याच्या आचार-विचारांना एक निराळाच गंभीरपणा येत चालला. संसार नि व्यवहाराचा गाडा चालवीत असतानाच, तो एका विशेष दृष्टिकोनातून सभोवारच्या समाज जीवनाची सूक्ष्म पाहणी करण्यात गुंग झालेला दिसे.
संसाराचा हा मामुली गाडा हयातभर असाच हाकत रहायचे काय? जन्माला आल्यासारखे मला आणखी काही करता येण्यासारखे नाही काय? `आणखी काही` म्हणजे तरी काय? त्याचे त्यालाहि उमगे ना. माझे सर्व काही ठाकठीक चाले असले म्हणजे आजूबाजूलाहि सब कुछ आल्वेल है असे थोडेच? जिकडे नजर टाकावी तिकडे दैन्य, दारिद्र्य, अज्ञान, सावकारांच्या तिजोऱ्या फुगवून कष्टकरी शेतकरी स्वतः अन्नवस्त्राला महाग. अन्याय, लाचलुचपत, पैशासाठी इमान विकणारे बाया बाप्ये, टीचभर स्वार्थासाठी दुसऱ्याचे गळे कापणारे महाजन!
अन्यायाला खोट्यानाट्याला प्रतिकार करायचीहि हिंमत कोणात नाही. अनेक घाणेरड्या रूढी, देवकार्यातले अत्याचार, गांजा-दारूचा भरसार फैलावा, देवधर्माच्या नावावर हज्जारों पशूंची हत्या गावोगाव राजरोस चाललेली. कोणीच या पापांच्या परवडीला थोपवीत नाही. मला काही करता येईल का? एकटा तडफडणारा जीव मी! पायांत संसाराची बेडी भक्कम खळाळत आहे. काहीतरी केलं पाहिजे खरं. हरकत तेवढ्यासाठी जिवाची हवी ती किंमत द्यावी लागली तरी. प्राण खर्चा घालावे, उघड्या डोळ्यांनी संसाराला आग लावावी, पण समाजातली ही शेकडो पातके खरचटून नाहीशी करावी. साधेल मला हे? कोण मला मार्ग दाखवील? या नि असल्या विचारांनी डेबूजी रात्रंदिवस बहरलेला असे.
कोण बरे ती विचित्र विभूती?
मार्गशीर्षाचा महिना. खरीप नि रब्बीची पिके भरघोस डुलत होती. पांखरे हुसकावण्यासाठी डेबूजी माचणीवर उभा राहून जोरदार हारळ्या मारीत असताना, भर दोन प्रहरच्या रखरखीत उन्हात दूर समोरून एक विचित्र व्यक्ति खैरी गावाच्या बाजूने हळूहळू चालत येताना त्याला दिसली. धिप्पाड बांधा, दणकट देहयष्टी, चमकती आंगकांति, दाढीमिशा जटाभार वाढलेला. आंगावर लक्तराची फक्त एक लंगोटी. अनवाणी चालत शेतातली ज्वारीची कच्ची कणसे खातखात स्वारी आपल्याच तंद्रीत रंगलेली आस्ते आस्ते जवळ येताना दिसली. साधूसंताचा डेबूजीला आधीच मोठा आपुलकीचा कळवळा.
ती विभूती माचीजवळ येत आहेशी दिसताच डेबूजीने खाली उडी मारली. दोन हात जोडून सामोरा गेला नि साष्टांग प्रणिपात घातला. त्या विभूतीने दोन हात उंचावून आशीर्वाद दिला. दोघांची नजरानजर झाली. डोळ्यांना डोळे भिडले. तेवढ्यातच परस्परांच्या हृत्भावनेची काय गूढ देवघेव झाली, सांगता येत नाही आणि गाडगेबाबाहि आज सांगत नाहीत. “महाराज, आपल्याला काय हवे?" असे डेबूजीने विचारताच त्या विभूतीने हसण्याचा खोकाट केला नि म्हटले, "कुछ भी नही. हमारेपास सब कुछ है । तू क्या मंगता है? मैं दे सकता हूं. मंगता है कुछ? चल हमारे साथ आता है?"
मंत्रमुग्धाप्रमाणे डेबूजी त्याच्यामागे यंत्रासारखे आपोआप जाऊ लागला. नदीच्या काठावर गेल्यावर, महाराजानी थोडे भोजन करावे, अशी डेबूजीने प्रार्थना केली. "ठीक ठीक, तेरी इच्छा हो तो जाव, लाव सामान." डेबूजी धावतच खैरी गावात गेला. कणिक, गूळ, साखर, तिखट, मीठ, तेल, तूप आणि एक कढई घेऊन आला. त्या विभूतीने ते सर्व पदार्थ एकत्र कालवून तो गोळा तेलात तळून काढला. "जा आता, ही भांडी ज्याची त्याला नेऊन दे." म्हणून सांगितले. डेबूजी गेला. परत आल्यावर विभूती भोजन उरकून त्याची वाट पहातच होती. थोडा प्रसाद ठेवला होता तो डेबूजीने ग्रहण केला. नंतर दोघे दापुरी स्मशानातल्या शिवलिंगाच्या ओट्यावर जाऊन बसले. सबंध रात्रभर तेथेच राहिले. काय भाषणे झाली, कसले हृद्गत चर्चिले, याचा थांगपत्ता लागत नाही. बाबाहि तो आज लागू देत नाहीत. कोणी खोचून विचारले तर "छे अशी कोणी विभूती मला भेटलीच नाही." असे धडकावून सांगून मोकळे होतात.
डेबीदास कहां है?
सबंध रात्र त्या विभूतीच्या सान्निध्यात काढून दुसरे दिवशी १२ वाजता डेबूजी घरी परत आला. जेवण होताच जरुरीचे काम निघाले. म्हणून बैलगाडी जोडून तसाच दर्यापूरला निघून गेला. त्याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमाराला, सारे दापुरी गाव डाराडूर झोपी गेले असताना, तो साधू "डेबीदास... डेबीदास... डेबीदास" अशा मोठमोठ्याने हाका मारीत गावात फिरू लागला. लोक घाबरून बाहेर आले. पहातात तो एक जटाधारी नंगा दांडगा गोसावी नुसता डेबीदास...डेबीदास आरोळ्या मारीत आहे. पाटील आले, चौकशी केली. “कहां है डेबीदास?" तो गोसावी विचारू लागला. आपल्या गावात कोण कुठचा डेबीदास? सगळे ढोंग आहे हे. हा दरोडेखोरांचा सोंगाड्या सुगावेदार असावा. द्या हुसकावून चोराला. पाटलाने महार जागल्यांना बोलावून त्याला सीमापार हुसकावून दिले.
बाबानो, काय केलंत हे?
दुसऱ्या दिवशी सकाळी डेबूजी दर्यापूराहून परत येताच त्याला आदले रात्रीची ही हकिकत समजली. तो मटकन खाली बसला नि फुंदफुंदन रडू लागला. सखुबाईने आजा आजीने खूप खादखोदून विचारले शेजारीपाजारी जमा झाले. बराच वेळ तो बोले ना. अखेर, "बाबानो, डेबीदास तो मीच. माझाच शोध करीत तो आला होता. हुसकावल्यात त्याला? काय केलंत हे?" असा त्याने खुलासा करताच सगळ्यांनाच वाईट वाटले.
डेबूजी तसा उठला. स्मशानाजवळच्या महादेवाच्या ओट्यावर नि आसपास खूप तपास केला. खैरी गावात शोध घेतला. आजूबाजूची पाच पन्नास गावे तो सारखा आठवडाभर विचारपूस करीत भटकला. असा कुणी माणूस इकडे आला नाही नि आम्ही कोणी पाहिलाहि नाही, असेच जो तो सांगे.
गाडीचा सांधा बदलला
या घटनेनंतर डेबूजीच्या राहणीत निवृत्तीत एकदम बदल झाला. रोजची ठराविक कामे यंत्रासारखी करीत असताना तो कसल्या तरी गूढ चिंतनात गुंगलेला असायचा. पौषाचा महिना. दर रविवारी ऋणमोचन येथे या महिन्यात एक छोटीशी यात्रा भरत असे. दरसालच्या हंबीररावच्या घराण्याच्या रिवाजाप्रमाणे पौष व. ८ शके १८२७ रविवार (ता. २९ जानेवारी सन १९०५ रोजी) डेबूजी सहकुटुंब सहपरिवार ऋणमोचनला गेला.
यानंतर त्याची मुग्धावस्था वाढतच गेली. भावी आचाराची काहीतरी निश्चित रूपरेषा त्याने मनोमन आखली. चर्येवर गंभीर महासागराची शांती आणि नजरेत कठोर निश्चयाची चमक झळकू लागली. एकदम घडलेल्या या फरकाने घरातली मंडळी चरकली खरी, पण खुलासा काढण्याचे धैर्य कोणालाहि होई ना.
चालू काळचा सिद्धार्थ
बुधवार ता. १ फेब्रुवारी सन १९०५, पौष व १२ प्रदोष शके १८२७ पहाटे ३ वाजता डेबूजीच्या त्या लोकोत्तर जीवन-क्रांतीचा क्षण आला. रात्रभर बिछान्यात तो तळमळत जागाच होता. निश्चयाच्या उसळीने एकदम तो उठला. मातोश्री सखुबाई निजली होती तेथे हळूच गेला. डोळे भरून त्या जन्मदात्या देवतेचे दर्शन घेतले. तिच्या पायांजवळ जमिनीला डोके टेकून नमस्कार केला. बाहेर येऊन आंगावरचे सर्व कपडे काढून ठेवले, नेसूचे एक फाटके धोतर पांघरून तो आंगणात आला. तेथे पहले एक फुटके मडके नि तोडलेल्या झाडाची एक वेडीवाकडी काठी हातात घेऊन, मागे न पाहता सर्वस्वाचा त्याग करून झपाट्याने पार कोठच्या कोठे निघून गेला. पहाटेच्या साखरझोपेच्या गुंगीतच सगळेजण असल्यामुळे, त्याच्या या क्रांतिकारक प्रयाणाचा घरातल्या दारातल्या कोणालाहि थांगपत्ता लागला नाही.
आजवर अनेकांनी संसारत्याग केलेला आहे. त्याची कारणे अठराविश्वे दारिद्र्य, कर्जाचा बुजबुजाट, मुलाबाळांचे मृत्यू, कर्कशा किंवा बेभान पत्नीशी पडलेली गाठ, कुटुंबात नि समाजात नित्य होणारी हेळणा, तिटकारा, बेकारी यापैकी एकदोन हमखास असतात. पण डेबूजीच्या बाबतीत यांतले एकहि कारण नव्हते. प्रामाणिक कष्ट, मेहनत करून आजोबाची शेतीवाडी कर्जाच्या पाशातून मुक्त करून त्याने सुधारली होती. घरात धनधान्य, दूधदुभत्याचा सुकाळ होता. चारचौघात प्रतिष्ठा होती. घरात आज्ञाधारक, पत्नी, दोन गोजिरवाण्या खेळत्या बागडत्या मुली, नातवंडांचे कौतुक करणारी आई, आजा आजी हयात, गाई-बैल, वासरांनी गोठा गजबजलेला. मायेचा हात पाठीवर फिरवणारी आई पाठीशी सदानकदा उभी.
अशा भरभराटीच्या संसाराचा डेबूजीने केलेला त्याग म्हणजे कपिलवस्तू येथील सिद्धार्थ राजपुत्राने निर्वाणाचा शोध लावण्यासाठी केलेल्या प्राचीन राजवैभवाच्या त्यागाच्या अजरामर इतिहासाची पुनरावृत्तीच म्हटली पाहिजे.
घरात रडारड झाली. गावकरी शोधासाठी दाही दिशाना गेले. काही तपास लागत नाही बुवा. सगळ्यांचा एकच जबाब आला.
****
प्रकरण २ रे
नव मानव-धर्माच्या शोधात
संसारत्यागाच्या मागे काय होते?
मामुली साधू संत मोक्षासाठी संसारत्यागाची भगतगणांना शिकवण देतात. डेबूजीला हे मोक्ष मुक्तीचे आणि हरिनाम स्मरणाने भवसागर तरू जाण्याचे आध्यात्मिक खूळ कधीच पटले नाही. जिवंत असता उपाशी मरान स्वर्गातल्या अमृतासाठी जवळ असेल नसेल ते दान करा, ही ताळी विचारसरणीहि त्याने जुमानली नाही. आजहि जुमानीत नाही, मग तो संसाराचा त्याग करून बाहेर का पडला? केवळ स्वतःच्या उद्धारासाठी तो तळमळत नव्हता. स्वतःच्या चिमुकल्या टीचभर संसाराच्या आधीव्याधीची कोडी त्याला सोडवायची नव्हती. ज्या मागासलेल्या खेडूती समाजात त्याचा जन्म झाला, त्यांच्या देवाधर्माच्या भावनांवर नि कल्पनांवर त्याचा विश्वास नव्हता. धर्माच्या नावाखाली रूढ असलेल्या अनेक दृष्ट आणि व्यसनी चालीरीतींच्या विरुद्ध त्याने बंडे केली होती आणि जातगोतवाल्यांचा रोषहि पत्करला होता.
देवाच्या नुसत्या नामस्मरणापेक्षा किंवा आराधनेपेक्षा मनगट घासून कष्टमेहनत केल्यानेच शेतीच्या मातीतून सोने काढता येते आणि शुद्ध आचारविचारांनी निर्मळ राहिल्यानेच व्यवहारातल्या दुष्ट नि लोभी माणसांच्या कारस्थानांना चाणाक्षपणाने नि धीटपणाने पायबंध ठोकता येतो, हे त्याने स्वानुभवाने इतरांना पटवूनहि दिले होते. भजनाचा त्याला नाद होता आणि ईश्वरावर त्याचा भरवसाहि होता. तरीहि त्याची भक्ति आंधळी नव्हती. डोळस होती. याच्या २८ वर्षेपर्यंत आजूबाजूच्या सर्व घरांतील समाजाच्या सामाजिक नि धार्मिक जिण्याचे त्याने सूक्ष्म निरीक्षण केलेले होते. शेतकरी कामकरी वगैरे मागासलेले समाज, हाडमोडी कष्ट करूनसुद्धा कमालीच्या दारिद्र्यात किड्यामुंग्यांच्या जिण्याने जगत आहेत. सावकारादि वरच्या थरातले वरचढ लोक त्यांना यंत्रासारखे कामाला जुंपून, त्यांच्या श्रमाची फळे आपण मटकावीत आहेत. श्रमजीवी लोकांना तर त्यांच्या भिकार जीवनाची ना किळस ना लाज, वरचढांच्या लाथा खाव्या, मरे मरेतो कष्ट करून त्यांच्या तिजोऱ्या भराव्या, आपल्या संसाराच्या मातीने त्यांची घरे दारे नि वाडे लिंपावे-शृंगारावे, हाच आपला धर्म, हेच आपले जिणे, यापेक्षा आणखी ज्ञान त्यांना काही नाही. केवळ पशुवृत्ती! वरच्या खालच्या एकंदर समाजाची दैनंदिन स्थिति पाहिजे तर माणसेच माणुसकीला पारखी झालेली.
धर्माचे आचरण पाहिले तर तेथेहि भूतदयेला थारा नाही. देवाला दारू, माणसांना दारू, रेडे बोकडांच्या कंदुरीशिवाय देवाची शांति नाही आणि धर्माची भूक भागत नाही. भजन कीर्तनाचा थाट केवळ मनाच्या विरंगुळ्यासाठी. संतांचे बोल तानदारीसाठी. संगीत सुराने वरच्यावर भिरकवायचे. अंतःकरणाचा नि त्यांचा जणू काय संबंधच नाही. सहानुभूति, सहकार नि सेवा या भावनाच हद्दपार झालेल्या. ज्याला जिथे मऊ लागेल, तिथे कोपराने खणावे नि स्वार्थ साधावा. आजवरच्या साधुसंतांनी माणसांना माणुसकी शिकवण्यासाठी जान जान पछाडली. कोटिकोटी अभंगरचना केली. पंढरीच्या वाऱ्यांचा परिपाठ चालवला. विठ्ठलभक्तीचे लोक आब्राह्मण चाण्डाळांच्या झोपडी-झोपडीपर्यंत नेऊन भिडवले. टाळ माळ चाळ एवढा वरवरचा देखावा रूढ झालाच; पण माणुसकीचे वाटोळे करणारा दुर्दैवाचा फाळ मात्र कोणालाहि उपटून झुगारता आला नाही. या परिस्थितीला आरपार पालटण्यासाठी काय केले पाहिजे? मला काय करता येईल? या मुद्याचाच डेबूजी आपल्या मनाशी बरीच वर्षे खल करीत होता.
षड्रिपूंचे दमन कसे केले?
सन १९०५ साली घरातून बाहेर पडल्यापासून तो सन १९१७ या बारा वर्षांच्या साधकावस्थेत डेबूजीने आपल्या देहमनाचा चोळामोळा करून काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षड्रिपूंचे गाळीव वस्त्रगाळ पीठ कसकसे केले, त्याच्या हजारावर गोष्टी सांगता येतील. या संक्षिप्त कथानकात केवळ त्रोटक संदर्भावरच भागवणे जरूर आहे. घरातून बाहेर पडल्यावर डेबूजी २-३ दिवस सारखा चालतच होता. कोठे जायचे नि काय करायचे याचा काही विधिनिषेधच नसल्यामुळे, पाय नेतील तिकडे जायचे, एवढाच कार्यक्रम, दापुरीपासून ४०-५० मैलावरच्या एका गावी सायंकाळी गावाबाहेरच्या मारुतीच्या देवळात विसाव्यासाठी जाऊन बसतो न वसतो तोंच हा कुणीतरी दरोडखोरांचा टेहळ्या असावा, अशा समजुतीने गावकऱ्यांनी नि पाटलांनी उपाशीतापाशी गावाबाहेर हुसकावून दिला.
पौषाचा महिना. वऱ्हाडातली थंडी. माणूस जागच्या जागी हातपाय काकडून कोलमडून पडायचे. किर्र अंधारी रात्र. काट्याकुट्यातून पाय नेतील तसा विचार डेबूजी वाट काढीत चालला. वाटेत त्याला एक खळखळणारा ओढा लागला. त्याने हातपाय तोंड धुतले. रिकाम्या पोटात अन्नाच्या ऐवजी पाणी रिचवले. थोडी हुशारी येताच शेजारच्या शेतातली ज्वारीची चारपाच कणसे तशीच कच्ची खाऊन, वर पाणी प्याला. विसाव्यासाठी ओढ्याच्या काठीच मातीवर झोपेसाठी आंग टाकले. किर्र जंगल. आजूबाजूला श्वापदांचा सुळसुळाट. पण काही नाही; खुशाल तो डाराडूर तिथे झोपी गेला.
झुंजमुंजू होताच उठावे. दिवसा आढळतील त्या दहापाच गावी भ्रमण करावे, एखाद्या घरी भाकरी तुकडा मागावा, मिळाल्यास खावा, नकार दिल्यास आणखी काही तरी मागावे, लोकांनी रागवावे, शिव्या द्याव्या, मारायलाहि उठावे, हुसकावून द्यावे. याच्या शांत वृत्तीवर लवभर सुद्धा परिणाम व्हायचा नाही. हुसकावले का पुढे जावे. या रीतीने गावांमागे गावे नि खेड्यांमागे खेडी धुंडाळीत डेबूजी कोठकोठे भटकंती करीत जाई. त्याचा त्यालाच ठावठिकाणा उमजे ना.
दिवसामागून दिवस गेले. दाढीचे नि डोक्याचे केस वाढले. जटा झाल्या त्यांच्या. आंगावर चिंध्या बाजल्या. नदी ओढा लागला का तेथे आंघोळ करावी नि त्याच धुतलेल्या चिंध्या ओल्याच पांघरून पुढे चालू लागावे. अशा विचित्र थाटाने ही स्वारी एखाद्या गावात घुसली का गावची ओढाळ कुतरडी भुंकभुंकून आधी त्याचे स्वागत करायची. मग गावची उनाड पोरे त्याच्या मागे "वेडा आला रे वेडा आला" असा कल्होळ करीत मागे लागायची. दगड मारायची. हा सर्व उपसर्ग शांत चित्ताने हसतमुखाने तो सहन करायचा. त्याचे पाय सारखे चालतच असायचे. विसाव्यासाठी गावात त्याला कोणी थाराच द्यायचे नाहीत. अर्थात विसाव्यासाठी सदानकदा किर्र निर्जन अरण्याचाच आसरा घ्यावा लागे.
वनवासातहि लोकसेवा
पाय नेतील तिकडे जायचे. हव्या त्या घरी भाकर मागायची. मिळेल तर खायची. नाहीतर पुढे जायचे. असल्या क्रमात जागोजाग कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे. हा एक धर्म डेबूजी कसोशीने पाळीत असे. सामानाने लादलेला खटारा चिखलात रुतून पडलेला दिसला का डेबूजी तेथे धावत जाऊन तो बाहेर काढायला गाडीवानाला मदत करायचा. त्याने कोण, कुठचा, काय पाहिजे, विचारले, तर नुसते हसावे, दोन हातानी त्याला नमस्कार करावा आणि मुकाटतोंडी आपल्या वाटेला लागावे. हा खाक्या. आश्चर्यानि तो गाडीवान पहातच रहायचा. देवच माझ्या धावण्याला धावला अशा समजूतीने तोहि गाडी हाकीत निघून जायचा.
वऱ्हाडचा सूर्य माध्यान्हीला माथ्यावर कडाडला आणि पाय पोळताहेच. एकादी मजूर बाई पाठीला पोर बांधून डोईवर लाकडाचा किंवा कडब्याचा मानमोड्या बोजा घेऊन चाललेली दिसली का डेबूजी तिच्याजवळ जायचा. दोन हात जोडून म्हणायचा, “माय माझी. दे तुझं ओझं माझ्या डोक्यावर. चल मी तुझ्या मुक्कामावर नेऊन पोचवतो." विचित्र वेषाचा हा असामी पाहून ती बाई प्रथम भेदरायची. पण डेबूजी ओझ्याला हात घालायचा, स्वतःच्या डोक्यावर घेऊन चालू लागायचा आणि तिला मुक्कामावर पोहचवून एक शब्द न बोलता आपल्या वाटेने निघून जायचा. ती बाई अचंब्यात पहातच रहायची. आजूबाजूचे गावकरीसुद्धा म्हणायचे, "कोण असावा हा माणूस? आपल्या झिंगरीचे ओझे मैलभर वाहून आणतो आणि भाकरी तुकडाहि न मागता खुशाल आपल्या वाटेने जातो? कुणी देवमाणूस किंवा साधू असावा हा!"
खेडेगावातल्या सार्वजनिक विहिरी म्हणजे घाणीची आगरे. आजूबाजूला घाणपाण्याचे ओघळ वहायचे आणि ढोरे तेच पाणी प्यायची. डेबूजीने हे पाहिले म्हणजे तो कळवळायचा. “मला पोहरा दोरी द्या हो मायबाप. मी पाणी काढून ढोरांना पाजतो." अशी त्याने विनंती करून पोहरा दोरा मिळवावा आणि विहिरीतून स्वच्छ पाणी काढून त्याने सगळ्या ढोरांना पाजावे. विहिरीभवतालची घाणेरडी जागा पावडे घेऊन स्वच्छ करावी. पोहरा दोरा पावडे ज्याच्या त्याच्या घरी पावते करावे आणि आपण पोटभर पाणी पिऊन पार दूर निघून जावे. लोक अचंब्यात पडायचे. हा कोण याबुवा आला, त्याने जागा स्वच्छ करून ढोरांना पाणी काय पाजले नि मुकाट्याने निघूनहि गेला. कोण असावा हा?
ज्वारी कापणीचा हंगाम चालू. स्वारी अशा शेतांजवळून चालली असताना थांबायची. मालकाजवळ "एक पाचुंदा द्या हो बाप्पा" म्हणायची, “तुझ्या बापाने ठेवलाय पाचुंदा." मालक गुरगुरायचा. (पासुंदा म्हणजे पांच पेण्ट्या.) "बरं तर दोन पासुंदे द्या." मालक रागवायचा. चल चालता हो म्हणून धमकावयाचा. कैक वेळा मारायला आंगावरहि धावायचा. जसे कोठे काही झालेच नाही अशा चर्येने डेबूजी तेथेच बसून रहायचा. मजूर कापणीत गुंगलेले. काम जोरात चालू. एकादी बाई किंवा बुवा घामाघूम थकलेली पाहून, डेबूजी त्याच्याजवळ विळा मागायचा. खुशीने दिला तर ठीक, नाहीतर घ्यायचा हिसकावून. "माजी माय, जरा विसावा घे.
मी करतो तुझं काम, रागावतेस कशाला?" असे म्हणून खसाखस कापणी करीत सुटायचा. इतर मजुरांच्या पुढे जाऊन त्यांच्यापेक्षा थोड्या वेळात दुप्पट तिप्पट कापणी करताना पाहून मजूर नि मालक डेबूजीकडे पहातच रहायचे. सारे मजूर दुपारच्या जेवणासाठी थांबले तरी याच्या कापणीचा सपाटा तडाखेबंद चालूच. या उपऱ्या प्रवाशी पाहुण्याने भलताच हात चालवून सगळ्यापेक्षा कापणीत तो पार पुढे गेलेला पहाताच मजूर नि मालक त्याला भाकरी खायला बोलावीत. ठरवलेले काम रेटले का डेबूजी ज्याचा विळा त्याला परत देऊन मिटल्या तोंडी पार निघून जायचा.
सारेजण त्या विचित्र माणसाच्या विलक्षण करणीचे कौतुक करीत त्याच्या वाटेकडे पहातच रहायचे. इथे आला काय, केली काय आणि भाकर देत असता ती नाकारून निघून गेला काय! हा झपाटेबंद कापणी काय कुणी साधू असावा का देवच असावा? एखाद्याने पाच दिल्याच तर त्या घ्यायच्या आणि वाटेत कुठे थकले भागलेले किंवा उपाशी पडलेले ढोर आढळले तर त्याला एक पेढी खायला घालायची, त्याला गोंजारायचे नि पुढे जायचे. ज्वारी वहाण्याचे काम कुठे चालू असले का डेबूजीने असेच आपण मजुरात घुसून पेण्ढ्या गोळा करण्याचे आणि गाडीवर त्या बांधण्याचे काम करीत सुटावे. कोठे औत चालू असतील तर तेथे जावे आणि तास दोन तास स्वतः औत चालवून, घाम पुशीत पुशीत शेतकऱ्याला नमस्कार करून निघून जावे. कोण कुठला प्रश्नाला जबाबच द्यायचा नाही. काम करावयाचे नि पसार व्हायचे. मनात आले तर दिली भाकरी खायची, नाहीतर देत असतानाहि पाठ फिरवून वाट धरायची. जागोजाग हे प्रकार होत असल्याच्या वार्ता खेड्यापाड्यांतून पसरल्या आणि पुण्यवानाच्या शेतात देव येऊन कापणी मळणी करतो, असल्या भुमका सगळीकडे ऐकू येऊ लागल्या. ज्यांना अनुभव आले होते, त्यांनी तिखटमीठ लावून त्या कथा सांगितल्यामुळे तर त्या विचित्र देवाच्या येण्याजाण्यावर लोक डोळ्यात तेल घालून वाट पाहू लागले.
अचाट निर्भयतेची कमावणी
एकदा स्वारी अशीच आपल्या तंद्रीत रंगलेली वाटचाल करीत असता एकदम मेघांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, तुफानी वाऱ्याचा सोसाटा चालू झाला. रात्रीची वेळ. जिकडे पहावे तिकडे गुडूप अंधार, इतक्यात मुसळधार पाऊस कोसळू लागला. वाटेत गुडघा गुडघा पाणी वाहू लागले. ओढे नाले खळखळू लागले. नदीचाहि प्रवाह नि वेग वाढला, पुढे पाऊल टाकायची सोय नाही. कुठे जायचे आता? फिरस्ता डेबूजी तसाच बिनदिक्कत चालत होता. अखेर वारा नि पाऊस यांच्या झुंबडीत टिकाव लागणार नाही, अशा समजुतीने नदीकाठच्या एका जुनाट निंबाच्या झाडाखाली निवाऱ्यासाठी थांबला. कसचे काय नि कसचे काय! वाऱ्याचा जो एक तडाक्याचा झोत आला, त्यासरशी ते प्रचंड झाड कडाडले आणि मुळासकट घाड्दिशी जमिनीवर कोसळले.
डेबूजी चट्कन बाजूला सरला म्हणून ठीक झाले. ज्याचा आसरा घ्यायला तो गेला, तोच कोसळून जमीनदोस्त झाला. आता पुढे काय? कडकडणाऱ्या विजांच्या प्रकाशात तसाच मार्ग काढीत काढीत तो एका टेकडीवर गेला. बारा नि पाऊस यांची झुंज चालूच होती. सुमाराला ते तुफान थंडावले, डेबूजी नखशिखांत चिंब भिजला. टेकडीवरच्या एका मोठ्या धोंड्यावर बसून त्याने सारी रात्र जागून काढली. अंगावरच्या भिजलेल्या चिंध्या अंगावरच वाळल्या. पहाट होताच स्वारीचे पाऊल पायपिटीसाठी लागले चालायला. बारा वर्षांच्या साधनावस्थेत गाडगेबाबांनी असले शेकडो प्रसंग अनुभवलेले आहेत. थंडी वारा पाऊस, कडाक्याचे ऊन्ह, तुफान वावटळी, रानातल्या वणव्यांची आग, एकूणेक प्रसंगात त्यांनी देहाची आसक्ती कसोटीच्या सहाणेवर घासून बोथट पाडली. मनाची शांति अचल राखली. काम त्यांनी जाळलाच होता. पण क्रोध लोभ मोह मत्सर मदादि विकारांचेही त्याचे दमनकार्य अखंड चालूच होते.
इतकेच काय, पण नेहमीच अरण्यांत वसतीचे प्रसंग असल्यामुळे, सर्प विंचू इंगळ्या वाघ कोल्ही लांडगे या क्रूर श्वापदांचेही भय त्यांनी गिळून टाकले होते. निर्जन रानावनात मन मानेल तेथे तो गाढ झोपी जाई. आसपास जंगली श्वापदे येवोत जावोत ओरडोत वेढा देऊन बसोत, काय वाटेल ते करोत, त्यांची त्याला पर्वा कशी ती कधी वाटलीच नाही. रातबेरात सुद्धा तो जंगलांतून प्रवास करीत असे. हव्या त्या ओसाड जागेत विसावा घेई. थंडीच्या दिवसात स्मशानात पेटलेल्या सरणाजवळ बसूनही शेक घेई. खाण्यापिण्याची तर पर्वाच नसे. मिळेल ते शिळेपाके कच्चे पक्के खुशाल चवीने खाई नि त्याला पचतहि असे. अनवाणी चालण्याचे पायताणांना भोके पडली तरीहि त्याचीहि खिसगणती त्याला नसे.
थोडे घरात डोकावू या
करता सवरता डेबूजी परागंदा झाल्यावर बळिरामजीने सगळ्या कामांचा उरक पत्करला, तरी आजा आजी आई दुःखात झुरतच होती. नातावळ्या गोतावळ्यानी यावे, दोन दिवस रहावे, समाधान करावे नि जावे. अखेर हंबीरराव आणि पाठोपाठ २-३ महिन्यानी रायजाबाई देवलोकी गेली. आता मात्र सखुबाईला आकाश फाटल्यासारखे झाले. निराशेच्या काळ्या ढगारालाही आशेची चंदेरी शलाका असते म्हणतात. डेबूजी गेला तेव्हा सौ. कुंताबाई ३ महिन्यांची गरोदर होती. रायजाबाईच्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसांनी बाळंत होऊन तिला मुलगा झाला. आईबापाचा मृत्यू आणि पाठोपाठ नातवाचा जन्म. जन्म-मृत्यूची ही पाठशिवणी सखुबाईच्या चांगलीच परिचयाची होती. मुलाचें नाव गोंविद ठेवून, सखुबाईंने जवळ काही गोतावळे जमवून त्याचे बारसे केले.
अखेर तपास लागला
एक दिवस मूर्तिजापूरला कामाला गेलेला बळिरामजी घरी आला आणि टांगा न सोडताच एकदम मोठ्याने ओरडला, "आत्या, डेबूदादाचा तपास लागला. तो साधू झालाय नि माहूर भागात फिरताना त्याला आपल्या एका वट्टीने पाहिले." चला, पत्ता लागला आता शोध करून त्याला घरी परत आणायची खटपटच तेवढी करायची. माहूर भागातल्या जातगोतवाल्याना इशाऱ्याचे निरोप रवाना झाले. वार्षिक ऋणमोचनची पौषी यात्राही जवळ आली. डेबूजी कुठेहि असला तरी ही यात्रा चुकवणार नाही ही सगळ्यांची खात्री.
ऋणमोचनचा रविवाऱ्या शंकर
दापुरीपासून ऋणमोचन अवघ्या ३ मैलावर. पौष महिन्यातल्या दर रविवारी तेथे यात्रा जमत असे. पूर्वी ती लहान असे. उगाच १०-१२ खेडूतांचे खटारे यायचे. गाडगेबाबांच्या माहात्म्याने मात्र गेली अनेक वर्षे त्या यात्रेला महोत्सवाचे रूप आलेले आहे. एकाद्या पौषात ५ रविवार आले का त्या शेवटच्या रविवारच्या देवदर्शनाचा महिमा मोठा; शंकराचा आवडता वार सोमवार. पण या ऋणमोचनच्या मुद्गलेश्वर महादेवाची यात्रा मात्र रविवारची. हे काय त्रांगडे आहे समजत नाही.
बहुतेक यात्रेकरू सर्व जमातीचे. रविवारी यात्रेला आले का प्रत्येकाने पूर्णा नदीत बुचकळी मारायची आणि ओलेत्याने शंकराला बेलपत्री वहायची, असा रिवाज. या शंकराचे नाव मुद्गलेश्वर म्हणून डेबूजीच्या अल्पायु मुलाचे नाव त्याने मुद्गल असे ठेवले होते.
चुकणार नाही, येईलच तो
पौष उजाडला नि रविवारहि आला. सखुबाई बळिरामजी वगैरे मंडळी मोठ्या पहाटेलाच ऋणमोचनला येऊन बसली. पण डेबूजी कोठेच आढळे ना! पूर्णा ऊर्फ पयोष्णा नदीचे पात्र ऋणमोचनजवळ फार अरूंद नि खोल काठच्या जमिनीचा चढाव तीन पुरुष उंचीचा. मोठा कठीण नि निसरड्या चिकण्या मातीचा. स्नान करून आलेल्याने वर येणारी मंडळी हटकून पाय घसरून पडायची. दरसालाची ही कटकट.
पण यंदा नवल वर्तले. कोणीएक चिंध्याधारी जटाधारी माणूस पावडे टोपली घेऊन ओल्या मातीवर सुकी माती भराभर टाकीत सकाळपासून सारखा झगडतोय. लोकांच्या वर्दळीने चढावाचा काठ भिजला का पडलीच याची सुक्या मातीची टोपली त्यावर कोण बुवा यंदा हा महात्मा आला ऋणमोचनला?
निरखून पहातात तो कोण! अहो, हा आपला डेबूजी वट्टी! जटा दाढी-मिशांचे जंगल उमाप वाढलेले, अंगावर फाटक्या चिंध्या, घामाच्या धारा निथळताहेत आणि आजूबाजूला किंचितही न पाहता, टोपल्या भर भरून सुकी माती आणून टाकण्याच्या कामात एकतान रंगला आहे. पिल्लू हरवलेल्या वाघिणीच्या उसाळीने सखुबाईने "डेऽबू... माझा डेबू"... अशी किंकाळी मारून त्याच्याकडे झाप टाकली.
ऐन कसोटीचा प्रसंग हाच
कोणालाहि नकळत घरदार सोडून देशोधडीला निघून जाण्याने संसाराचा मोहपाश तोडला जातोच, असे थोडेच आहे? मोहपाशापासून लांब दूर असे तोवर ही भावना किंवा कल्पना ठीक असते. निर्जन अरण्यातल्या वस्तीत ब्रह्मचर्याची शेखी कोणीहि मिरवावी. पण सौंदर्यवान तरुणींच्या मेळाव्यात खेळीमेळीने राहून ब्रह्मचर्य टिकवील, त्याचीच खरी शहामत आणि तोच अखेर कसोटीला उतरणार.
देह-मनाची मुंडी मुरगाळून कामक्रोधादि षड्रिपूंचे दमन करण्यात डेबूजीने एक वर्ष वनवासात घालवले. पण या घडीला त्याच्याभोवती जन्मदाती आई, शेजेची बायको, लडिवाळपणाने हाताखांद्यावर खेळवलेल्या दोन गोंडस लहान मुली आणि गृहत्यागानंतर झालेल वंशाचा आधार असा तो छोटा पुत्र गोविंद, शिवाय गावोगावचे सारे जिवाभावाचे सवंगडी यांचा लोखंडी साखळदंडासारखा वेढा पडलेला. आई रडत ओरडत आहे. बायकोच्या डोळ्यांतून आसवांचे पाट वहात आहेत. मामी मामेभाऊ स्नेहीसोबती यांच्या विनवण्या चालू आहेत. डेबूजी निश्चळ वृत्तीने सगळ्यांकडे निर्विकार मुद्रेने पहात आहे. फत्तरावर घणाचा घाव घातला तर एखादी कपरी तरी उडते. पण येथे काही नाही!
"मी मेलो असतो, तर तू काय केले असतेस?"
एवढेच आईला बोलून डेबूजी उठला. आता तो जाणार निघून, असे पहाताच सखुबाईने हंबरडा फोडला. “अग, एवढी ओरडतेस कशाला? मी काही आत्ताच जात नाही कुठे. हा पौष महिना इथेच आहे." असे सांगून डेबूजी गेला निघून दुसरीकडे.
"डेबूजी वट्टी आला रे आला"
ही हाक यात्रेकरूंत फैलावल्यामुळे, सगळे गणगोत नि लंगोटीमित्र त्याला पहायला धावले. दरसाल नदीच्या निसरड्याचा अनुभव सगळ्यांना होता, पण ओल्याचिंब मातीवर सुकी माती टाकून लोकांचे हाल कमी करण्याची कल्पना नि योजना आजवर एकाहि शहाण्याच्या डोक्यात आली नव्हती. आणि आज? परागंदा झालेला आपला डेबूजी या विचित्र वेषाने यात्रेला येतो काय आणि यादवजी पाटलाकडून टिकाव पावडे टोपली घेऊन एकटाच ते काम करतो काय!
लोकहितासाठी असली कामे कोणी ना कोणी केलीच पाहिजेत, ही कल्पनाच ज्या खेडूताना नाही नि नव्हती, त्याना डेबूजीचा हा खटाटोप पाहून काय समजावे हेच समजे ना. कोणी म्हणे "बिचारा वेडा झाला." कोणी आई बायको मुलांकडे पाहून कळवळत. दुसरा विशेष शहाणा शेरा मारी कीं "अहो पहिल्यापासून याला देवाधर्माची आवड, म्हणून झाला आता तो बैरागी साधू." तिसरा तुंकाराने सांगे, "अहो कसला देव नि कसला धर्म! याने आपल्या कुळदैवत खंडोबा नि आसराईचे बोकड दारू बंद करून विठोबा रखमाई करू लागला, वाडवडलांची चाल मोडली. फिरले डोके नि झाला असा वेडा पिसा", ज्याला जसे सुचले, तसे तो लोकांच्या जमावात येऊन शेरे मारी नि निघून जाई.
खराट्याचा नवा धर्म
सगळ्या यात्रेकरूंची स्नाने आटोपल्यावर, डेबूजीने स्वतः स्नान केले, आंगावरच्या चिंध्या धुतल्या नि तशाच पुन्हा पांघरल्या. देवळात जाऊन महादेवाला नमस्कार केला. फराळाला बसलेल्या अनोळखी यात्रेकरूकडून चतकोर तुकडा भाकर चटणी कालवण मागितली आणि मडक्यात घेऊन नदीकाठी तो खात बसला. आईने त्याच्यापुढे फराळाचे जिन्नस ठेवले, तिकडे त्याने पाहिलेहि नाही. भाकर संपताच तो उठला आणि गेला निघून दूर कोठेतरी.
संध्याकाळी लोक पहातात तो डेबूजी हातात खराटा घेऊन यात्रेतली सारी घाण झाडून साफ करीत आहे. कागद पानांची भेण्डोळी, खरकट्याचे तुकडे, फार काय, पण जागोजाग लोकांनी केलेली मलमूत्रविसर्जनाची खातेरी, पार सगळे स्वच्छ झाडून साफ करण्याचा झपाटा चाललेला. सकाळी याने दरडीवर माती टाकून लोकांची स्नाने सोयीची केली. वाटेत दिसलेला दगड धोंडा गोटा दूर नेऊन टाकला. आता तर यात्रेतला सारा घाण केरकचरा स्वतः भंग्याप्रमाणे साफ करीत आहे. हा काय वेडा आहे होय? येथल्या घाणीमुळे ऋणमोचनला कसली ना कसली रोगराई होतेच. आपण कधी लक्षच दिले नाही. दरसाल असे होतेच, एवढ्यावरच आपली अक्कल ठेचाळायची. पण त्या रोगराईला ही घाण कारण, हे आज आपल्याला या डेबूजीने शिकवले. याला वेडा म्हणणारेच वेडे, बरे, याला साधू म्हणावे, तर आजवरचे साधू असली कामे करताना कोणी पाहिलेच नव्हते.
सारे लोक मंदिरातल्या दगडी शिवलिंगाच्या आरत्या धुपारत्यांत गुंतलेले, तर हा यात्रेकरूंच्या सुखसोयीसाठी आणि आरोग्यासाठी बाहेरची घाण काढण्यात हाडे मोडून घाम गाळीत आहे. गाभाऱ्यातला तो दगडी देव श्रेष्ठ का देवळाबाहेरचा हा झाडूवाला श्रेष्ठ? विचारी होते ते हा विचार उघड बोलू लागले. डेबूजीकडे ते विशेष कौतुकाने नि आदराने पाहू लागले. “अरे वेडा कसचा हा! हाच खरा महात्मा. सकाळपासन तो तुमची सेवा करीत आहे. आता तर तुमची सारी घाण निपटून यात्रेचे ठिकाण स्वच्छ करीत आहे. ही लोकसेवा म्हणजेच खरी देवाची सेवा. उगाच टाळ मृदंग कुटून भजनाचा टाहो फोडून काय होणार आहे?" असे बरेच लोक बोलू लागले.
माणुसकीचा संदेश
सगळी घाण निपटल्यावर डेबूजी सखुबाई बसली होती, तेथे आपण होऊन आला. नमस्कार केला सगळ्या लहान थोरांना आणि मुकाट्याने बसला. सखुबाईने आंगावरून हात फिरवला. ती सारखी रडत होती. सभोवार असलेल्या सगळ्यानी घरी परत येण्याविषयी आग्रह केला. "मी तुझ्याबरोबर आलो नि उद्या परवा मेलो, तर तू काय करशील? आजोबा आजी मामा गेले त्यावेळी काय केलंस तू आणि करणार तरी कोण काय? स्वतःपुरतेच सगळेच पहातात. पण शिलकी आयुष्य गरजवंत लोकांच्या सेवेत झिजवले, तर तीच खरी देवाची सेवा. देवळातल्या दगडी देवाचे हातपाय रगडून काय होणार? सभोवार पसरलेली ही माणसांची दुनिया, हे खरे ईश्वराचे रूप. त्या हजारो लाखो देवांची पडेल त्या रीतीने केलेली सेवाच देवाघरी रुजू होते. सुवासिक फुले पत्री आणून दगडी मूर्तीवर वाहण्यापेक्षा, सभोवार पसरलेल्या हालत्या बोलत्या चालत्या दुनियेच्या सेवेसाठी हाडे झिजवली, भुकेल्यांच्या तोंडात भाकरीचा घास घातला, तरच जन्माचे सार्थक होईल. त्या पत्रीफुलांपेक्षा माझा खराटा झाडूच श्रेष्ठ आहे. उमजायचे नाही तुम्हाला ते आज." इतके बोलून डेबूजी उठला नि गेला निघून.
("मी तुह्या संग आलो अन् सकाय परवा मेलो त तु काय करशीन? आबा, आजी, मामा मेले त्या वाकती त्वा काय केलं अन् कोन् काय करनार? आपल्या पुर्त सर्वेच पाह्यतत पन्. उरलं हुए आयुष्य अळल्या नळल्या गरजी लोकाईची सेवा कऱ्याले खरसलं तर तेच खरी देवाची सेवा आहे. देवळाईतल्या दगळ गोट्याच्या देवाचे हात पाय दाबून काही होत नाही. भोंवताली पसरलेली ही माणसांची दुनिया हेच खरं देवाचं रूप आहे. त्या हजारो लाखो देवांची करता येईल त्या मार्गानं सेवाच करन देवाच्या घरी रुजु होईन. वासाचे फूलं बेल आनून देवाच्या गोट्याच्या मूर्तीवर बाह्यल्यापक्षे भवतालच्या चालत्या बोलत्या लोकांच्या सेवेत आयुष्य खरसलं, भुकेल्या हुया लोकांच्या तोंडात भाकरीचा घास घातला, तरच जलमाचं सार्थीक होईन. त्या फुलपत्रापक्षे माझा खराटा अन् झाळनंच मुद्याचं आहे. आज काही तुम्हाले ते समजनार नाही.")
यात्रा संपली, डेबूजी पसार
कोठे सटकला त्याचा थांग ना पत्ता, पुन्हा पायपिटी नि वनवास. दररोज १५ ते २५ मैलांची दौड सारखी चालू. रात्र नाही. दिवस नाही. ऊन्ह थंडी पाऊस नाही. तुफाने वादळे झंजावत नाही. त्याचे पाय सारखे चालतच रहायचे. जाताजाता शेतातली कणसे कांदे मिरच्या शेंगा गाजरे काय मिळेल ते खायचे आणि विसाव्यासाठी मनाला येईल तेथे आंग टाकायचे. कोणत्याहि गावात एक दिवस किंवा एक रात्र यापेक्षा अधिक काळ रहायचे नाही. भूक लागली का हव्या त्या दारी जायचे आणि मायबाप चटणी भाकर द्या ही आरोळी मारायची. कोणी द्यायचे, कोणी हुसकवायचे. शिळी पाकी कशी का असे ना, भाकर चटणी कालवण मडक्याच्या टवकळात द्यायचे आणि दूर नदीकाठी अथवा गावाबाहेरच्या विहिरीजवळ बसून ती खाल्ली का झाली स्वारी पसार दुसरीकडे.
कित्येक वेळा पोलीस नि पोलीसपाटील डेबूजीला चौकीत बंदिवानहि करायचे. काही ठिकाणी तर चोर समजून पोलिसानी त्याला उपाशी ठेवावे, कबुलीसाठी रात्री खूप मार द्यावा. याचे काही नाही, मार खात असतानाहि हा हसायचा. पक्का बेरड आहे लेकाचा म्हणून आणखी छळायचे. डोईवर जडजड पेटारे देऊन पाचपाच मैल चौकीवर चालत न्यायचे. तेथे आणखी तपास व्हायचा. कोणी सज्जन दुसऱ्या गावी गांवकरी भेटावा नि त्याने "अहो हा वेडा आहे, असाच गावोगाव भटकत असतो." असे पोलिसाना सांगितले म्हणजे सुटका व्हायची. लगेच स्वारी आपल्या तंद्रीत हासत हासत पुढे रवाना व्हायची.
कोणी निंदा वंदा वा अटकेत करा बंदा, कशाची काही दिक्कत खंत वाटायचीच नाही. शारीरिक मानसिक वैचारिक अवस्था एकतान निर्लेप निर्विकार नि स्थितप्रज्ञ. पुष्कळ वेळा तो मुद्दामच लोकांचा राग आपणावर ओढून घ्यायचा. षड्रिपूचे दमन किती झाले आहे. याची क्षणोक्षणी पदोपदी तो कसोटी लावून पहायचा. कसोटी लावून पहायचा! लिहा बोलायला शब्द फार सोपे आहेत. वाचायलाहि काही कठीण जात नाहीत. पण तसल्या एकाद्या प्रसंगाची नुसती कल्पना करून पहा, म्हणजे डेबूजीच्या साधकावस्थेतील तपश्चर्येची कदर किती भयंकर होती, याची थोडी फार कल्पना झाली तर होईल.
विक्षिप्तपणाचे काही नमुने
(१) कोणी जेवत बसले असता एकदम जवळ जाऊन भाकरी मागायची. चतकोर तुकडा देऊ केला का याने अर्धी भाकर मागायची. बरं अर्धी घे म्हटले तर सगळी द्या मागायची. तीहि पुढे केली का सगळ्या भाकऱ्या मागायच्या. तुला सगळ्या दिल्यावर आम्ही रे काय करायचे? तुम्ही उपाशी रहा, मला फार भूक लागली आहे. अशा जबाबाने प्रकरण शिब्यागाळी हुसकावणीवर यायचे. तसे ते आले का स्वारी निमूटपणे पुढे चालू लागायची.
(२) एखाद्या गाडीच्या मागेमागे चालायचे. दोनतीन मैल हा कोण चिंध्याधारी गाडीमागे चालतोय, याची गाडीवानाला शंका येऊन तो विचारायचा. मला गाडीत बसू द्या. कुठं जायचं आहे तुला? तुम्ही जाता त्याच गावाला. बरं बस गाडीत. तुम्ही खाली उतरा मग बसतो मी, बैलाना दोघांचे ओझे होईल. अखेर काय? शिव्या निंदा नि टवाळी. तेवढी पूजा घेतली का स्वारीने पायांचा मोर्चा वळवलाच दुसरीकडे.
(३) दोन प्रहरी एकादी बाई शेतावर नवऱ्यासाठी भाकरीचे गाठोडे नेत असताना, स्वारीने तिला हाक मारून थांबवाने आणि भाकरी मागावी. माय, भूक लागलीय, दे ते भाकरीचं गठोडं मला. औतकऱ्याला मग कायरे देऊ? राहील तो उपाशी, मला काय त्याचे? उसळून ती बाई कडाकडून शिव्या देऊ लागली का स्वारी निघून जायची.
(४) एकाद्या शहरात हमाल लोक दिवसाच्या मजुरीच्या पैशाची वाटणी करीत बसलेले पाहिले का स्वारी जवळ जायची. भिकारी समजून ते एकादा पैसा देऊ लागायचे. पैसा नको, मला रुपाया हवा. रुपाया? तुझ्या बापाने ठेवलाय, चल हो चालता इथून, प्रकरण धक्काबुक्कीवर आले का पोबारा करायचा.
(५) मोळी विकणारे भेटले का त्यांच्याजवळ लाकडे मागायची. तुला रे लाकडे काय करायची? सैपाक करीन बाप्पा. सैपाक? कशावर करणार? धोतरावर करीन. सगळे हासायचे. खांदाडावर डोकं दिसतं, पण ते मडकं रे मडकं! धुडकावणी झाली का स्वारीला समाधान.
(६) तीनप्रहरी एकाद्या घराशी जावे नि भाकरी मागावी. भाकरी शिल्लक नाही म्हटले तर शेवया द्या, मला शेवया फार आवडतात. तुझ्या बापाने ठेवल्यात म्हटले तर दूध द्या गाडगेभर अशी मागणी करायची. दूध नाही तर दोन शेर गूळ दे माय खाऊन पाणी पिईन. घरवाला बाहेर यायचा नि स्वारीला दण्डा दाखवून हुसकावून द्यायचा.
(७) गावच्या विहिरीवर हात पाय सोडून बसायचे. मालक दिसला का त्याला विचारायचे “काय हो, महारांची विहीर कोणती?" डेबूजीला महार समजून तो आईमाईवरून शिव्या देऊ लागायचा. “पण मालक, मी नुसता बसलो आहे, पाणी नाही प्यालो अजून, आता पितो." मालकाने दगडधोंडे मारून स्वारीला हुसकवायचे.
(८) एकदा एका देवळात पुराण चालले होते. खेडूतांची गर्दी. वेदान्ताचा एक मुद्दा पुराणिकबुवा मोठ्या अवसानाने श्रोत्याना ओरडून ओरडून सांगत होते. सारेजण मोक्षाच्या विमानात बसल्यासारखे देहभान विसरून रंगले होते. एकदम डेबूजी आरोळी मारतो "भाकर द्याहो मायबाप. लइ भूक लागलिया पाय पडतो. बापहो, भाकर द्या." या आरोळीमुळे पुराणात एकदम खंड पडला आणि मोक्षाच्या आध्यात्मिक विमानात तरंगत असलेले सारे श्रोते धाड्कन बसल्याजागी जमिनीवर असल्याच्या भानावर आले. पुराणिकबुवा संतापले.
पुराणिक - काय रे ए गाढवा, मनुष्य आहेस का कोण आहेस?
डेबूजी - मी कोण ते आपण सांगितलंच.
पुराणिक - पुराण चाललंय दिसत नाही तुला?
डेबूजी - पुराण चाललंय, दिसतय मला मायबाप. पण भाकर मागायला भिकारी आला तर पुराण चालताना ती त्याला देऊ नये, असं कोणत्या पुराणात लिवलंय, दादा?
पुराणिक - फार शहाणा दिसतोय लेकाचा. पुराणाच्या जागी भाकर आणतात का कुणी? चल चालता हो. नाही तर.....
डेबूजी - इथं नसेल तर आणवून द्या कुठूनतरी फार भूक लागलिया बाप्पा.
पुराणिक - पुराण बंद करून तुला भाकर आणून द्यायला, कोण असा तू मोठा साधू लागलास? कोण आहेस तू? महार का मांग?
डेबूजी - मी माणूस आहे महाराज.
पुराणिक - ते कळतंय आम्हाला. जात कोणती तुझी?
डेबूजी - जात? माणसाची.
पुराणिक - हे विचित्र सोंग कशाला घेतलंस?
डेबूजी - साधू होण्यासाठी मायबाप.
पुराणिक - अरे अकलेच्या कांद्या, हलक्या जातीचे लोक कधी साधू झालेत का आजवर? त्याना देव तरी कसा भेटणार?
डेबूजी - बरं तर. साधू होण्याचा फंद देतो टाकून. पण मला फार भूक लागलीय. भाकर द्या. लवकर द्या. जीव कासावीस झाला.
“द्यारे हुसकावून द्या या गाढवाला. नसती पीड़ा शिंची." असे पुराणिकबुवा कमाण्डरच्या अवसानात लोकाना ओरडून सांगत आहेत आणि लोक मात्र जागच्या जागी बसून एकमेकांच्या तोंडाकडे टकमक पहात आहेत, असा देखावा तयार होतो.
पुराणिक - (चिडून) खूप धंदा शोधून काढलाय गाढवानं. तरणाबांड असून भिक्षा मागतोस. लाज वाटायला पाहिजे तुला.
डेबूजी - लाज असती तर भिक्षा कशाला मागितली असती महाराज.
पुराणिक - पहा पहा कसा चुरचुर एकाद्या पंडितासारखा बोलतोय तो. आजकाल ताळतंत्रच राहिले नाही. जातीचा हा हलका आणि म्हणे साधू होऊ इच्छितो. साधू व्हायला आमच्यासारख्या श्रेष्ठ जातीतले सारे लोक मेले का काय? म्हणून या चिंध्या मडके धाऱ्यावर ती पाळी आली. सज्जनहो, पहा, ऐका, खालच्या वर्गातले लोक अशी आपली पायरी विसरून वरिष्ठांची पायमल्ली करू लागल्यामुळेच पाऊसपाणी गेले, शेती बुडाली आणि हे असले भिकारी दिवस आले.
इतके वादळ उठले तरी डेबूजी शांत मुद्रेने जागच्या जागी उभाच. ओरडून ओरडून पुराणिकबुवांचा घसा खरचटला. ते किंचित थांबले का दिलीच त्याने पुन्हा जोराची आरोळी भाकर बाढा हो मायबापानो. अखेर मंडळीतून कोणीतरी उठले आणि त्याला बखोटे धरून लांब दूर नेऊन घालवला.
कुटाळांच्या अड्डयावर
हरएक गावात कुटाळ लोकांची टोळकी असायचीच, चावडीवा किंवा गावाबाहेरच्या पिंपळाच्या प्रशस्त पारावर त्यांची बैठक, नीर पाण्याला जाणाऱ्या बायका पोरींची नि इतरांची टिंगल टवाळी करायचा त्यांचा धंदा अजूनहि चाललेला दिसतो. डेबूजी असल्या वाटेने जाऊ लागला का ते टोळके त्याला हाका मारायचे, तो मुक्या बहिऱ्यासारखा पुढेच चालत असायचा. मग टोळीतला कोणीतरी त्याला आडवा जायचा,
- काय रे, हाका मारल्या त्या ऐकू नाहीत का आल्या? चल फिर माघारा.
- मला पुढं जायचे आहे.
- अरे हो मोठा पुढं जाणारा. मागं फिर. पाटील बोलावताहेत तुला.
- मला काय पाटलाशी करायचं बाप्पा?
- पाटलांचा कचका माहीत नाही वाटतं. येतोस, का नेऊ खेचीत?
- खेचीत न्या.
धकांड्या मारीत स्वारीला चावडीपुढे किंवा पाराजवळ आणायचे.
पाटील - कुठून आलास रे?
डेबूजी - इकडून आलो.
पाटील - इकडून? इकडून म्हंजे कुठून?
डेबूजी - इकडून म्हंजे तिकडून.
पाटील - चाललास कुठं?
डेबूजी - इकडून आलो, तिकडं जाणार.
पाटील - तिकडं म्हंजे कुठं?
डेबूजी - पाय नेतील तिकडं.
पाटील - कोण आहेस तू?
डेबूजी - बाप्पा, मी आहे भयाणा.
पाटील - घरदार बायकापोरं काही आहेत का?
डेबूजी - आठवत नाही.
पाटील - आईबाप तरी होते का?
एक टवाळ - का आकाशातनं पडलास?
डेबूजी - हो अगदी तसंच.
टवाळ - तरणा तगडा दिसतोस. बायको नाही का केलीस?
डेबूजी - केली होतीसे वाटतं.
पाटील - मग घराबाहेर कशाला पळालास?
डेबूजी - बायकोनं दिलं हुसकून म्हणून.
पाटील - बायकोनं हुसकलं नि तू बाहेर पडलास? शहाणाच आहेस.
डेबूजी - शहाणा नाही बाप्पा. भयाणा आहे भयाणा.
असली कसली तरी भरमसाट उत्तरं देऊन तो आपली मनसोक्त टिंगल टवाळी निंदा करून घ्यायचा. क्रोध लोभ मोह मद मत्सरादि षड्रिपूंची खरचटून झाडणी करण्यासाठी डेबूजीने साधकावस्थेच्या केलेल्या या विलक्षण तपश्चर्येला ‘असामान्य` हे विशेषण सुद्धा अपुरे पडेल.
ऋणमोचनचे ऋण फेडले
सन १९०७ साली डेबूजी बिनचूक ऋणमोचनच्या यात्रेला आला. या वर्षी त्याने नामसप्ताह आणि भंडाऱ्याची योजना जमातीपुढे मांडली. लगोलग चार पाचशे रुपये जमा झाले. पक्वान्नांची भांडी चुलीवर चढली. तिकडे ओल्या दरडीवर सुकी माती घालण्याचा डेबूजीचा कार्यक्रम चालू झाला. संध्याकाळी ५ वाजल्यावर सरळ ओळीत पद्धतशीर पंगती मांडल्या. सगळ्या स्त्री पुरुषांना नि मुलांना हातपाय धुऊन पानांवर बसवले. वाढणीसाठी स्वयंसेवकांची योजना केली. काही बायकाहि तयार झाल्या. प्रत्येक पानापुढे उदबत्त्या लावल्या आणि सर्व सिद्ध झाल्यावर पुण्डलीक वरदा हाऽरी विठ्ठलच्या जयघोषात भोजनाला प्रारंभ झाला. परीट जमातीचा हा शिस्तवार भंडारा पहायला गावोगावचे लोक धावून आले.
पंगती चालू असताना डेबूजीने एकतारीवर सुखर अभंगांचे गायन करून, त्यातूनहि आत्मोद्धाराचे नि समाजोन्नतीचे ज्ञान श्रोत्यांना दिले. डेबूजीच्या संघटन चातुर्याची जो तो मनमुराद वाहवा करू लागला. मागासलेली नि अडाणी नाक्षर परीट जात. पण तिला हे नवीन शिस्तीचे नि संघटनेचे वळण डेबूजीने लावलेले पाहून, त्या जमातीत त्याचा मोठा आदर होऊ लागला. एवढा मोठा मिष्ठान्नाचा भंडारा झाला. हजार बाराशे पान झाले. मोठा सोहळा झाला. डेबूजीने अभंग गाऊन पंगतीची करमणूक केली. अखेर खरकटी काढली. भांडी घासली. जागा साफ केली आणि स्वतः मात्र चट्कन कोठेतरी जाऊन मिळवलेल्या शिळ्यापाक्या भाकरी चटणीवर नदीकाठी जाऊन आपले नेहमीचे जेवण केलेले पहाताच हजारो स्त्री-पुरुषांच्या डोळ्यांत कौतुकाचे, कृतज्ञतेचे आणि आदराचे अश्रुबिंदू चमकले.
अखेर दगडी घाट झाले
डेबूजीच्या खटपटीमुळे ऋणमोचनच्या पौषी यात्रेला सालोसाल वाढते. महत्त्व येऊ लागले. दरसाल यात्रा जमावी. स्नानासाठी नदीकाठच्या घसरणींवर लोकांची घसरगुंडी चालूच रहावी आणि तेथे डेबूजीने सुकी माती टाकायचे हाडमोडे काम करीत रहावे, हे काही ठीक दिसत नाही. हा विचार लोकांच्या मनात घोळू लागला. नदीला फरसबंदी घाट बांधला पाहिजे. एवढी डेबूजीच्या तोंडून अस्पष्ट सूचना निघायची थातड, भराभर जागच्या जागी वर्गण्यांचे आकडे आणि रोख रकमा जमू लागल्या. सांगवी दुर्गडे येथील डेबूजीशी जमिनीबाबत तंटा केलेल्या सावकारानी बनाजी प्रीथमजी तिडके आणि त्यांचे बंधु तुकाराम प्रीथमजी तिडके यानी पुढाकार घेऊन वर्गणीचे ठोक रकमेचे आकडे प्रथम टाकले.
सन १९०८ साली पूर्णानदीचा पहिला घाट बांधून तयार झाला. जमलेल्या रु. ७,५०० पैकी घाटाचे काम होऊन रकम शिल्लक उरली, तेव्हा वर्गणीदारांच्या इच्छेप्रमाणे घाटाशेजारीच श्री लक्ष्मी-नारायणाचे देऊळ बांधण्यात आले. यानंतर सालोसाल अनेक लोकानी देणग्या देऊन नदीच्या दोनहि तीरांवर योग्य ठिकाणी आणखी चार घाट बांधले. ४-५ वर्षांनंतर डेबूजीने परीट समाजात ऋणमोचन यात्रेच्या निमित्ताने एकेक नवा समाज-संघटनाचा प्रघात चालू करावा. भंडाऱ्याच्या जोडीने त्याने नाम-सप्ताहाची प्रथा चालू केली. मांसभक्षण नि दारुबाजी या व्यसनांच्या हकालपट्टीची निकराने चळवळ केली. देवाच्या नावाने जागोजागी होणाऱ्या पशुपक्ष्यांच्या हत्त्या महापाप ठरवून बंद पाडल्या. भंडारा करून उरलेल्या पैशानी मोठमोठी भांडी खरेदी करवली. सन १९९४ साली पत्र्याची धर्मशाळा बांधून ती पंचांच्या ताब्यात दिली.
लोकहिताच्या असल्या अनेक खटपटी कराव्या. त्या लोकांच्या हवाली व्यवस्थेसाठी सोपवाव्या आणि आपण मात्र झटकून नामानिराळे रहावे. फार काय, पण पार दूर कोठेतरी निघून जावे, असा त्याच्या जीवनाचा ओघ चालू झाला. "डेबूजी आमच्या परीट जातीचा पाणीदार मोती आहे." असे एकाने सहज म्हणताक्षणीच, "नाही हो बाप्पा, मी एक फुटके खापर आहे. मोत्यासारखा कुणाच्या छातीवर हारात रुळत रहाण्यापेक्षा, मोत्याच्या थेम्बासारखा दवाचा कण म्हणून तान्हेल्या चिमणीच्या घशात नेमका पडावं, ही तर माझी सारी खटपट आहे." असा जबाब द्यायचा.
ऋणमोचनप्रमाणे मार्की (ता. अमरावती), पिंजर (ता. आकोला) आणि माहूर (निजाम प्रदेश) येथील यात्रांतून डेबूजीने भंडारे, नामसप्ताह आणि धर्मशाळा चालू करून, स्वतः त्या कोठल्याहि उद्योगाच्या मोहात नाममात्रहि राहिला नाही.
डेबूजी पुढे, कीर्ती मागे
ठिकठिकाणच्या या कार्यामुळे डेबूजीचे नाव लांबवर फैलावले. कोण हा असावा, तो पाहिला पाहिजे एकदा, असे जिकडे तिकडे लोक बोलू लागले. वाट फुटेल तिकडे जाण्याच्या नित्य क्रमात तो कोठेहि गेला, कोणालाहि भेटला, तरी त्याने आपले नाव चुकूनहि कधी कोणाला सांगितले नाही आणि आजहि सांगत नाहीत. तोच हा लोकसेवक डेबूजी असे लोकानाहि पटायचे नाही. एवढी मोठमोठी संघटनेची कामे करणारा आणि परिटांसारख्या मागासलेल्या समाजात जागृतीचे अमृतसिंचन करणार असा वेडाविद्रा, रकटी चिंध्या पांघरणारा, मडके गळ्यांत बांधून फिरणारा, दिगंबर असेलच कसा? याला तरी लोक पुढारी मानतील कसे नि याचे ऐकतील कसे? दरसाल हजार गावे पायपिटीत पालथी घातली, लाखो बऱ्या वाईट लोकांशी संबंध आला, पण कोणालाहि डेबूजीच्या नावागावाचा थांगपत्ता लागला नाही.
डेबूजीची कीर्ती वऱ्हाड, खानदेश, नागपुरापर्यंन्तच्या मागासलेल्या समाजात फैलावत गेली. स्वतःच्या संसारावर पाणी सोडून इतर हजारो अडाणी नाक्षर म्हणूनच स्वाभिमानाला मुकलेल्या श्रमजीवी कष्टाळू जनांचे संसार ठाकठीक सावरण्याची अक्कल शिकवणारा हा नवीन साधू पहाण्यासाठी ठिकठिकाणचे
लोक उत्कंठित झालेले असत. काही दिवसांनी कोणी सगेसोयरे आले, त्यांनी डेबूजीच्या वेषाची वृत्तीची नि ग्रामसेवेची माहिती दिली म्हणजे "अरे हो रे हो. परवाच तो आमच्या गावी येऊन गेला. आम्ही समजलो का असेल कोणी वेडापीर. त्याने चावडी सारवून साफ केली. विहीरीचा पाणवठा खराटा घेऊन स्वच्छ केला. ढोरांना पाणी पाजले, त्या सोनबा पाटलाच्या सुनेचे कडब्याचे ओझे डोक्यावर नि तिचे पोर खाकोटीला घेऊन त्याने तिला ७ मैल सोबत केली नि घरी आणून घातली. बाबा, काय भाकर बिकर खातोस का म्हणून विचारले तर काहीहि न बोलता नुसता हासला नि नमस्कार करून धावत पळत गेला निधून. अरेरे, दापुरी ऋणमोचनचा तोच का डेबूजी? किती अभागी लोक आम्ही आम्ही त्याला ओळखलेसुद्धा नाही हो. छे छे छे. फार वाईट गोष्ट झाली." असे तडफडायचे.
रेल्वे आमची मायबाप
भटकंतीमध्ये रेल्वेचाहि प्रवास यायचा. उतारूंच्या गर्दीत स्वारी खुशाल घुसून आगगाडीत जाऊन बसायची. मनात येईल तेथे आणि फास्ट गाडी असल्यास ती थांबेल तेथे उतरायचे, हा क्रम. तपासणीत तिकीट कलेक्टराला हा विनातिकिटाचा उतारू आढळला का त्याने शिव्यागाळी करून, धक्के मारून बाहेर काढायचा. झडती घेऊन कफल्लक आढळल्यामुळे, एकदोन चफराका लगावून स्टेशनाबाहेर हुसकून द्यायचा. दुसरी गाडी आली का स्वारी घुसलीच आत नि चालली पुढे. हे साधले नाही तर खुशाल पुढची एक दोन स्टेशने पायी चालत जायचे आणि तेथे एकादी गाडी पकडून पुढे चालते व्हायचे.
काशी प्रयाग यात्रेचा प्रवास :
डेबूजीने असाच केला. परत येताना इटारसी स्टेशनवर एका गोऱ्या इन्स्पेक्टरने त्याला तिकिटाशिवाय नि कफल्लक प्रयास करताना पाहिले मात्र, हाणली ढुंगणावर बुटाची लाथ नि दिला भिरकावून फलाटफार्मावर. त्या डब्यात एक मुसलमान गृहस्थ बसला होता. त्याच्या डोळ्याना टच्कन पाणी फुटले. तीन चार गटांगळ्या खाऊन, डेबूजी उठला नि तो गोरा अधिकारी दूर गेल्याचे पाहून पुन्हा डब्यात घुसला.
मुसलमान :
अरे बाबा, कां एवढा हाणमार सोसतोस? जवळ पैसे नसले तर पायी प्रवास करावा. तिकिटाशिवाय कां बरं घुसावं नि जागोजाग असली मारपीट खावी?
गाडी चालू झाली होती. डेबूजी हात जोडून त्याला म्हणाला, "हे पहा जनाब साहेब, गोऱ्या साहेबाची एक लाथ खाल्ली तर १०० मैल सुखाने पुढे आलो ना मी? पायाने चालतो तर ऊन्ह आहे, थंडी आहे, पाऊस आहे, किती तरी त्रास असतो चालताना. त्यापेक्षा दर जंक्शनवर एक बुटाची ठोकर काय वाईट? एक लाथ बसली का चालला १०० मैल पुढे."
त्या सज्जन मुसलमान गृहस्थाने डेबूजीची अवस्था पाहून दहा रुपयांची नोट पुढे केली. "साधूजी, ए लेव. ऐसी मारपीट में नहीं देख सकता." डेबूजीने त्याला हात जोडून विनयाने म्हटले, "जनाब साहेब, पैसा मला काय करायचा? ही काठी, हे मडक्याचे टवकळ नि आंगावरच्या या चिंध्या एवढीच माझी धनदौलत नि संपत. आपण दिलदार आहात. डेबूजीची ती निरिच्छ वृत्ति पहाताच त्या गृहस्थाचे डोळे पाण्याने डबडबा भरून आले, "तुम बड़े अवलिया हो." असे म्हणून तो डेबूजीचे पाय धरणार तोच तो चटकन बाजूला सरला, "जनाब, नमस्कार देवाला-अल्लाला करावा. माणसाचे पाय धरू नये."
घार फिरे आकाशी परि चित्त तिचे पिल्लांपाशी
बारा वर्षांच्या वनवासात दापुरी किंवा तेथले घर यांचे दर्शन डेबूजीने कटाक्षाने टाळले होते. चुकून एकदाहि तिकडे कधी तो फिरकला नाही. तरीसुद्धा समाजहिताच्या चालू केलेल्या नानाविध कार्यावर त्याचे लक्ष बिनचूक लागलेले असे. परीट जमातीत आणि मागासलेल्या इतर समाजात ज्या ज्या राक्षसी नि घाणेरड्या रुढींच्या उच्चाटणाची आपण खटपट केली, त्या खरचटून नाहीशा झाल्या का या ना त्या आडपड्याने तशाच चालू आहेत, याचा तो वरचेवर कानोसा घेत असे. त्याचे एकनिष्ठ मित्र नि अनुयायी त्याला कोठेतरी गाठून भेटून सल्लामसलत घेत असत.
हुण्डा-देज-निषेधाचा तडाखा
लग्नकार्यात वरपक्षाने किंवा वधूपक्षाने हुंडा किंवा देज देता घेता कामा नये, असा प्रचार त्याने केलेला होता. जो कोणी हे पाप करील, त्याच्या लग्नाला कोणी जाऊ नये, बहिष्कार घालावा. हुंड्याच्या नि देजाच्या प्रघाताने दोन्हीही कुटुंबे कर्जबाजारी होतात. हातच्या शेतीला गुराढोराना मुकून सावकाराचे दास बनतात. नवविवाहित जोडप्याचा नवा संसार कर्जाच्या उकिरड्यावर चालू करणे महापाप आहे, आत्मघात आहे. लग्नासाठी सावकाराचे कर्ज काढून गावजेवणावळीचा, आरसपरस आहेरांचा नकली श्रीमंतीचा खोटा थाट करण्यापेक्षा, गरिबाला साजेशोभेशा झुणका भाकरीने तो साजरा करावा, असा त्याचा प्रचार कीर्तनांतून नेहमीच होत असे. आजही तो चालूच आहे.
एका उरलेल्या लग्नात बऱ्हाडमंडळ जमून नवरानवरीला हळद लागल्यावर, वर पित्याने हुंड्याची मागणी केली. वधूपिता गांगरला. ठरावाची भाषा बदलली तरी हळद लागल्यावर लग्न मोडायचे कसे? हुंडयाची अट पुरी केलीच पाहिजे. सावकाराकडे कर्जासाठी जाणाऱ्या वधूपित्याला डेबूजींच्या स्थानिक मित्रांनी थोपवून धरले आणि चारी दिशांना हेर पाठवून डेबूजीला तेथे बोलावून आणले. त्याने वरपित्याची समजूत घालण्याचा खूप प्रयास केला. पण तो आपला हट्ट सोडी ना. `हे लग्न मोडले` असा पुकारा करून डेबूजी जवळच्या एका गावी गेला आणि तेथे एका तरुणाला लग्नासाठी उभा करून त्या मुलीचे त्याच्याशी झुणका भाकरीच्या मेजवानीने थाटात लग्न करून दिले. नवलाची गोष्ट, त्या हुंडेबाज तरुणाला पुढे कोणीही आपली मुलगी द्यायला धजला नाही आणि तो जन्मभर अविवाहितच राहिला.
एकतारीयरची भजने
भटकंती चालू असताना डेबूजीने शिंदीची एक हातभर फाटकी हातरी आणि एक एकतारी या दोन वस्तूंची आपल्या इस्टेटीत भर घातली. नागपुराकडे हातरीला चापरी म्हणतात. म्हणून त्या प्रदेशात त्याचे नाव चापरेबुवा असे पडले आहे. एकतारी कुठून मिळाली? कोणी दिली? कधी दिली? याविषयी मी स्वतः बाबांनो विचारले असता "मले काय आठवत नाय आता." असे उत्तर मिळाले. "ओसाड अरण्यात फिरत असता माझी नि एका जक्खड म्हाताऱ्याची गाठ अवचित पडली. तो. एकतारीवर, भजने गात असे. मलाहि भजनाचा नाद. मीपण बसलो त्याच्या शेजारी भजने गात. कधी तो एकतारी वाजवायचा, कधी मी वाजवायचा, दोघांचे काही दिवस छान जमले होते. मी बाळगलेली एकतारी मला कोणी दिली का त्या म्हाताऱ्या बाबाजींनी दिली, आज काही आठवत नाही." हा त्यांनी आणखी खुलासा केला.
आधीच डेबूजीला भजनाचा नाद मोठा. `रामकृष्ण हरी जब रामकृष्ण हरि जय, गोविंद राधे गोविंद राधे` हेच नि एवढेच हरिनाम स्मरण करीत तासन्तास तो एकांतात निमग्न गात बसायचा. भजनाच्या सरावामुळे आधीच आवाज गोड झारदार, तशात जातिवंत तल्लीनतेने हरिनामाचे गायन, त्यामुळे कोठेही तो गात बसला तरी आजूबाजूचे लोक हां हां म्हणता सभोवार जमून त्याचे भजन मुकाट्याने ऐकत बसायचे. "अरेच्या, हा वेडा बुवा भजने छान म्हणतो!" ही आवायी आसपासच्या खेडेगावांत जायची आणि तो गावात आला म्हणजे, `बुवाजी, गा थोडे भजन गा" असा लोक आग्रह करायचे. गा म्हटल्यावर गाता तर मग तो डेबूजी कसाला? लोक म्हणतील त्याच्या काहीतरी उलट करायचे, त्याना राग आणायचा, त्यांच्या शिव्या खायच्या, चिडून ते मारायला उठले का त्यातच परमानंद मानायचा, हा खाक्या. लोकानी "म्हण की लेका एकादा अभंग." "असा अट्टहास चालवायचा आणि "मले कायबी येत नाथ दादा." असे बानी म्हणायचे. "मग झक मारायला ती एकतारी कशाला जवळ बाळगलीस? टाक फोडून." असे म्हटल्यावर “मी कशाला फोडू बाप्पा. तुम्हाला वाटले तर टाका फोडून." या उत्तरावर कोण काय जबाब देणार?
कधीकधी भजनासाठी लोक हट्ट धरायचे. स्वारीने एकतारी बेसूर लावायची आणि भसाड्या आवाजात भजनाला प्रारंभ करायचा. मग मंडळी `आता बंद कर बाबा तुझं हे भजन.` असा ओरडा करून निघून जायची.
स्वारी लहरीत असली नि कोणी “बुवा, भजन करता का?" असे विचारले तर “हो हो. रात्री गावाबाहेर करीन देवाचे कीर्तन. गावकऱ्याना निमंत्रणे द्या, बत्त्यांची सोय करा, म्हणजे थाट होईल." चिंध्या मडकेधारी फटिंगाची ही थाटामाटाची भाषा ऐकून लोक नि पोरेटोरे खदखदा हासायची. कोण जातो एवढी कीर्तनाची सरबराई करायला? झाले. रात्री १० वाजले. डेबूजीने आपली एकतरी सुरात लावली.
रामकृष्ण हरि जय भजनाला सुरुवात केली. गावाबाहेरचा उकिरडा आजूबाजूला काजळी अंधार. एकतान एकसुरी भजनाचा तो भरघोस गोड आवाजाचा सूर कानी पडताच, "कोण रे कोठे गात आहे? फार छान भजन चालले आहे. चला चला, जाऊ या तिकडे." म्हणत एक धावला. दुसरा धावला. तिसरा, चवथा, पाचवा. बायकापोरे बाप्ये म्हातारेकोतारे सारे गाव जमायचे डेबूजीभोवती त्या अंधारात. "अरे एकादा दिवा तर आणा कुणी." असे कोणी म्हटल्यावर एकादे टमरेल यायचा कुणीतरी घेऊन लोकांनी काहीहि केले तरी स्वारी आपल्या एकतारीच्या भजनात बेभान राहीन. बरेच लोक जमले म्हणजे स्वारीने भजन करायचे बंद. मग लोक ओरडायचे, “बुवाजी काही तरी सांगा. सांगायचे नसेल तर निदान भजन तरी आणखी वेळ चालू द्या."
लहर असली तर हरिनामाचे महत्त्व, समाजावर संतांचे उपकार, या मुद्यांचा मुखडा घेऊन, शेतकरी कामकरी समाजांतील कित्येक वाईट रूढी, जनावरांची हत्या, शिक्षणाचे माहात्म्य, व्यसनांचा दुष्टपणा, स्वच्छतेची जरूरी, या नि असल्या विषयांवर डेबूजी असे काही चित्तवेधक प्रबंधन करायचा का आबालवृद्ध सारे श्रोते अगदी गहिवरून जायचे. “हा म्हणतो ते सारे खरे आहे रे खरे आहे. हा काही वेडा नाही. आपल्या खेडूत समाजाची याची पहाणी फार बारीक आहे. हा साधू आहे. ठेवून घेऊ बाला आणखी दोन दिवस आणि करू या याची कीर्तने चांगला त्यांचा झगझगाट करून." गावकऱ्यांचा इकडे हा बेत चाललाय तर तिकडे डेबूजी पहाटेलाच उठून गाव सोडून पसार
दापुरीत काय घडले?
९-१० वर्षे गेली. आता घरच्या सगळ्यांची खात्री पटली का डेबूजी पुनश्च संसारात बसणे अशक्य. म्हणून बळिरामजीने थोरली मुल अलोकाबाईचे लग्न ठरवले. डेबूजीने आशीर्वाद पाठवला, पण लग्नाला आला नाही. मातोश्री सखुबाईचेहि प्रपंचावरून चित्त उडाले. रात्रंदिवस श्री हरिनामभजन करू लागली. या अपेक्षित क्रांतीची खबर लागताच डेबूजीने ऋणमोचनजवळच्या एका ओसाड खेड्यात एक काट्याकुट्याची झोपडी बांधली. आई बायको मुले यांना तेथे रहायला सांगितले. झोपडीत सारा संसार मडक्यांचा. सखुबाई नि कुंताबाई मोलमजुरी करून कसाबसा निर्वाह करीत तेथे राहिल्या. डेबूजी चुकूनहि कधी तिथे वस्तीला किंवा अन्नग्रहणाला रहायचा नाही. कधीमधी फेरा आलाच तर वाजवीपेक्षा अधिक गाडगे मडके आढळल्यास ते कोणाला तरी देऊन टाकायचे. निर्वाहापेक्षा अधिक धान्य दिसल्यास गोरगरिबांना ते वाटायचे आणि जय जय रामकृष्ण हरि गर्जना करीत भटकंतीला निसटून जायचे असा खाक्या चालू झाला.
या चंद्रमौळी झोपडीनेहि वऱ्हाड मुंबई पुणे वगैरे अनेक ठिकाणी प्रवास केलेला आहे. गाडगेबाबा केव्हा येतील आणि चला उठा म्हणतील, त्याचा नेम नसायचा. असेल ती झोपडी मोडायची आणि भलत्याच ठिकाणी दुसरी थातरमातर उभारून तिथे आई बायको मुलाना सांगायचे रहा म्हणून. ऋणमोचन, आमले, झिंगले, मूर्तिजापूर, पुन्हा आमले, नंतर शेगांव, फाटफ, मुंबई किंग सर्कल, नारायण शेटची वाडी माटुंगा, पुणे, आळंदी, पुन्हा मुर्तिजापूर, परत पुणे शिवाजी पार्क दादर, बांद्रा, अशा अनेक ठिकाणी त्या काट्याकुट्याच्या झोपडीचे स्थलांतर झाले, याची याद कोठवर द्यावी? प्रत्येक ठिकाणी नुसती झोपडी कशीबशी उभी राहायची, कोणी चांगली जागा देऊ केली तर ती कटाक्षाने नाकारायची. आणि पोट भरण्याची सोय काय? तर जे मी करतो तेच करा तुम्ही, हा जबाब. गाडगे बुवांचे कुटुंब म्हणून कोणी भक्त काही अन्न धान्य देऊ म्हणेल तर तेहि परवडायचे नाही. भटकंतीचा फेरा आला नि झोपडीत काही कापडचोपड धान्य आढळले का निघालेच ते बाहेर आणि झाली त्याची गोरगरिबाना खैरात, हा प्रकार अजूनही चालूच आहे.
याविषयी बाबांचे एका काळचे एक निकटवर्ती अनुयायी मूर्खानंद यांची एक आठवण येथेच वानगीदाखल दिलेली बरी.
"पुण्याला सोमवार पेठेत बाबांची एक धर्मशाळा. तिच्या शेजारी एक लहानशा झोपडीत सौ. कुंताबाई रहात होत्या. आमच्यापैकी कांहींनी आणि इतर बाबांविषयीं आदर असलेल्यांनीं आईंना कांहीं बाही आणून द्यावे. त्यांनी लोभाविष्ट दृष्टीने त्याकडे पहात म्हणावें, "काह्याले आल बाप्पा? साधुबाबा (बाबा) येतीन्, तर राहू देतीन् म्हनतां काय? अईमाय्! त्याहिच्या हातावर तर जसा कर्नराजा (कर्ण) येऊन बसला!" बाबांना असे भले बुरे म्हणत आईनीं ती वस्तु घ्यावी आणि आपल्या झोपडीत लपवून ठेवावी.
केव्हांतरी बाबा पुण्याला यावेत. आईंनीं घाईघाईनें धर्मशाळेंत येऊन बाबांना म्हणावें, "तुमाले ममईले जावू लागते ना?" बाबांना ही त्यांची युक्ति माहीत. त्यांनी आपल्या पत्नीशी म्हातारपणचा विनोद करावा, "बाप्पा! जेव्यागिव्याले घालीत नाहीस काय मले?" आणि त्यांनी आईच्या झोपडीकडे चालू लागावे.
झाले! झोंपडीत मोठ्या युक्तिबाजपणे आईनीं लपवून ठेवलेल्या सामानाची लागली वाट! आईनीं घाईघाईनें बाबांच्या मागोमाग निघावे. कुणाला ठाऊक? भांडाभांडी करून कदाचित् या वेळी तरी त्यांतली एखादी वस्तु ठेवून घेता येईल!
पण बाबा सरळ झोंपडीत शिरायचे! मग मला सर्वहुत यज्ञ करणाऱ्या ऋषींची आठवण व्हावी! बिचाऱ्या आईजवळ बाबांच्या तीक्ष्ण दृष्टीपासून वस्तू लपवून ठेवण्याची चातुरी कुठून असणार? बाबा झोंपडीत लपलेल्या एकेक चिजा बाहेर काढायचे. कुठें कुणी दिलेली चादर, घोंगडी, लुगडे, तांब्या, परात, पळी, पार सगळ्या वस्तूंचा बाहेर ढीग पडायचा. फारतर काय, आईंनी घर म्हणून ठेवलेलें धान्यही बाबा राहू द्यायचे नाहीत! आणि शेवटी वकिली करूनहि बाबांपुढे टिकाव लागला नाही, की आईंनी जणूं एकाद्या प्रिय जनांची प्रेतयात्रा निघावी, तशी मुद्रा करून सतृष्ण दृष्टीने त्या वस्तूंकडे पहात कपाळावर हात देऊन बसावें!
बाबांनी कष्टकरी मंडळीस हांका मारून तें सगळें सामान वाटून टाकावें आणि आईस म्हणावे, "आतां कशी झ्याक् झाली तुही (तुझी) झोपडी? बसली काय तथीसा? जेव्याले नाही देत काय?"
आईंनी तावातावानें म्हणावें, "आता कुकून (कुणीकडून) घालू जेव्याले? तुमचा हात फिरला अशीन (असेल) सगया (सगळ्या) झोपडीवर! आतां हाड्याले (कावळ्याला) तुकडा घाल्यापुरतंहि पीठ कशाला ठेवलं असन् तुम्ही ?" बाबांनी मोठमोठ्याने हसत धर्मशाळेकडे निघावें! आणि हा असा क्रम अनेक वर्षे सुरू होता!
प्रकरण ३ रे
लोकजागृतीची पार्श्वभूमि
सन १९०५ ते १९१७च्या बारा वर्षांच्या साधकावस्थेत मनसोक्त देशपर्यटण, प्रत्यक्ष जनसंपर्काने नि संघर्षाने षड्रिपूंचे दमन, एकतारीचे कीर्तन आणि जागोजाग कट्टर निरिच्छतेने चालवलेली मानवसेवा नि पशुसेवा. या गोष्टींच्या साधनाबरोबरच लोकस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण हा डेबूजीच्या चरित्रातील महत्त्वाचा गाभा आहे. आजवरच्या साधुसंतांचा लोकसंग्रह आणि डेबूजींचा लोकसंग्रह यात जमीन अस्मानाचा भेद आहे. हा भेद नीट लक्षात येण्यासाठी या लोकहितवादी कर्मयोगी संताने बृहन्महाराष्ट्रात सिद्ध केलेल्या लोकजागृतीची आणि लोकोपयोगी मोठमोठ्या संस्थांच्या माहात्म्यांची पार्श्वभूमि त्याशिवाय नीटशी नजरेत भरणार नाही.
महाराष्ट्राची संत-परंपरा प्राचीन आणि असंख्य आहे. त्यांचा लोकसंग्रहहि अफाट नि विशाल आहे आणि त्यांतून उद्भवलेले पंथ आणि संप्रदाय यांचीहि संख्या अगणित आहे. बहुतेक सगळ्या संतसंप्रदायांचा अट्टहास पारलौकिक सौख्य नि मोक्ष यांवरच खिळलेला. पृथ्वीवरील प्राप्त जिण्याची, संसाराची आणि व्यवहाराची प्रत्येक संताने कडकडीत शब्दांत निर्भर्त्सना करून आपल्या शिष्यादि अनुयायांना परलोकच्या अमृतासमान काल्पनिक जीवनासाठी सर्वस्वाला झिजविण्याचाच उपदेश केलेला आहे. संत-परंपरेच्या या महिम्यामुळे महाराष्ट्रात बुवाबाजीचे भरमसाट पीक सारखे पिकत आलेले आहे आणि लक्षावधि स्त्री-पुरुष जागोजागच्या मठस्थ पीठस्थ बुवा-महाराजांच्या भजनी लागून, वाजवी व्यवहाराच्या नि विहित कर्तव्याच्या क्षेत्रांत भ्याड पराङ्मुख नि दुबळे होऊन बसले आहेत. जरा कुठे एकादा विचित्र किंवा विक्षिप्त माणूस पारलौकिक मोक्षसाधनाची स्पष्ट वा अस्पष्ट बडबड करताना दिसला, लोकव्यवहारापेक्षा भलतेच वेडेचार करताना आढळला का हां हां म्हणता लोक त्याला बुवा किंवा महाराज बनवतात. त्याला मठ बांधून देतात. देवासारखी त्याची पूजा अर्चा भजने आरत्या करतात.
बुवाच्या लोकोत्तर नि लोकविलक्षण चमत्कारांच्या गप्पा स्वानुभवाच्या साक्षी पुराव्याने चोहीकडे फैलावण्यात येतात. मोठमाठे पैसेवाले, निपुत्रिक, पदवीधर, शिकलेले, संसारांत पिकलेले आणि बेकर्तबगार म्हणून दैववादाला विकलेले उल्लू त्या बुवाच्या साधूपणाचा नि अवतारीपणाचा एकच डांगोरा पिटतात. त्याच्या लोकविलक्षण भलभलत्या कुकर्मावर नि बद्कर्मावरहि गूढ अध्यात्माची जरतारी शालजोडी पांघरतात. जिवंतपणी यात्रांचा थाट आणि मेल्यावर समाधीची देवस्थाने निर्माण होतात. त्या बुवा महाराजांचा एक ठराविक संप्रदायच चालू होतो. शिष्यसमुदाय आजूबाजूला तयार झालेलाच असतो. मग बुवांच्या मागे पट्टशिष्य म्हणून गादीवर कोण बसणार या भानगडीचे तंटे लागतात. कारस्थाने चालतात, मारामाऱ्या होतात; मठात जमलेल्या द्रव्यनिधीचे, मठ, समाधि, शेतवाड्या, इमारतींच्या हक्कांचे वाद आणि तंटे कोर्ट-कचेऱ्यांच्या पायऱ्या खतवू लागतात. काही वकील शिष्य या बाजूला, काही त्या बाजूला असा देखावा उभा राहतो. म्हणजे बुवांचे खरेखोटे अध्यात्म जाते बुवांच्याबरोबर समाधीत आणि मठ समाधीच्या संसाराचे त्रांगडे लागते शिष्य-प्रशिष्यांच्या मागे.
या सगळ्या उपद्व्यापांत नि मोक्षसाधनाच्या हलकल्होळात देशाची अवस्था काय आहे? मागासलेल्या श्रमजीवी जनतेच्या जिण्याची स्थिति कशी आहे? किती लोक एक वेळा जेमतेम खातात आणि किती उपासमारीने मरत आहेत? भिकारी लोकांची, लंगड्या पांगळ्या वेड्या लोकांची संख्या कां वाढत आहे? त्यांच्या जगण्या मरण्याची कोणी विचारपूस करतात का नाही? वर्षभर शेतांत राबूनहि शेतकरी भिकेला कां लागला? शेकडो जमातींची दिनचर्या अनेक घाणेरड्या रूढींनी कशी पाशवी अवस्थेला पोचली आहे? व्यसनातिरेकानी कुटुंबेच्या कुटुंबे उकिरड्यावर कशी झुगारली जात आहेत? सावकारांचा नि सत्ताधाऱ्याचा जुलूम गावोगाव कसा होत आहे? इत्यादि प्रश्नांची त्या मठ-पीठ-पूजक अध्यात्मवादी गबरूंना चिंता पर्वा दिक्कत लवमात्र नसते. तू तो राम सुमर, जग लढवा दे, हा एकच त्यांचा खाक्या! बुवाबाजीच्या जाळ्यात अडकलेल्या हर एक बाई बुवाची विवंचना स्वर्गलोकच्या साधनासाठी. तेवढ्यासाठी मारे कथा कीर्तने पुराणे नि भजनांचा आटोकाट अट्टहास अखंड चालू
कथा कीर्तनानी केले काय?
कथा कीर्तने पुराणे आणि भजने या संस्था बऱ्याच जुन्या आहेत. लोकांत धर्मजागृति केल्याची पुण्याई त्यांच्या पदरी बांधण्याचा एक संभावित शिरस्ता आहे. ती धर्मजागृति कोणती? कथा कीर्तन पुराण भजन वाटेल ते ऐका, त्यात प्रवचनाचा मुख्य ओढा गूढ अशा अध्यात्माच्या काथ्याकूटाकडे. ते अध्यात्म खुद्द कथाकाराला नि पुराणकारालाहि उमजलेले नसायचे. फक्त पोथीतल्या जडबंबाळ शब्दांची ते नुसती पोपटपंची करतात. आत्मा परमात्मा योग सिद्धी समाधी गुरूपदेश सदेही विदेही मोक्ष इत्यादि शब्दांची भरमसाट पेरणी केली का चढला कथा पुराणांना रंग. सारे श्रोते मोक्षानंदात डुलत राहायचे. कथा-पुराण संपून उठले का झाडलेल्या उपरण्याच्या फटकाऱ्यातच ते सारे ब्रह्मज्ञान झटकून जायचे. कोरडा पाषाण श्रोता घरी आल्यावर विचारले का "काय, आज कथा कशी काय झाली?" तर उत्तर काय? "वा वा वा! बुवा मोठा विद्वान. बहुश्रुत, अधिकारी. संगीताची साथ पण छानदार. खूप रंग भरला, खूप रंग भरला."
कथा पुराणांनी गेल्या दोन तीनशे वर्षांत खरोखरच काही धर्मजागृति केली असती तर हिंदू जनतेला आजची हीन दीन लीन क्षीण अवस्था आलीच नसती. भजनानी मागासलेल्या समाजात धर्मजागृति केली म्हणावी तर तेथेहि हाच परिणाम दिसून येतो. कथा पुराण भजनानी लोकांत देवभोळेपणा, भिक्षुक बडवे बामणांचा वरचढपणा, भलभलत्या दान-दक्षिणांचे घाणेरडे प्रघात, इहलोकाविषयी नि स्वतःविषयी तिटकारा आणि परलोकाच्या प्राप्तीसाठी काळीजतोडी विवंचना, बायका-मुले संसार व्यवहाराचा पातकीपणा, तीर्थयात्रांचे दान-पिंडांचे भिक्षुक भोजनांचे गोदानांचे फाजील स्तोम, धातू दगडधोंड्यांच्या मूर्तिपूजनांचा अट्टाहास, उपासाचा बडेजाव, अशा हजार भिकारड्या भानगडी फैलावण्याचे कर्म मात्र केलेले आहे.
तीनहि लोकी श्रेष्ठ असलेल्या ब्राह्मण कथा पुराणकारांनीच असले भलभलते प्रचार कथापुराणांतून फैलावल्यावर, अनाडी लोकानी जाखाई जोखाई मरीआई म्हसोबा बहिरोबा खंडोबा वगैरे शेकडो गावठी दैवतांची पैदास करून त्यांनाहि कोंबड्या-बकऱ्यांचे बळी देऊन संतुष्ट करण्याचा कारखाना खेडोपाडी धूमधडाक्याने चालवला, तर त्यात नवल कशाचे? नाक्यानाक्यावरील ओसाड जागेत एकेक गावदेव ठाण मांडून बसला आणि आवस - पुनवेला कोंबडी बकरी दारूचा नैवेद्य हबकू लागला. माणसांच्या अंगातहि तो घुमू लागला. असल्या घुम्यांचा एक पंथच निर्माण झाला. घरात तापसराई येवो अथवा गावात पटकीचा आजार फैलावो, औषधोपचाराऐवजी सगळ्या गावकऱ्यांची भिस्त देव खेळव्या घुम्या भगतावर. भटांभिक्षुकांप्रमाणे घुम्या भगत सांगेल ती पूर्व. त्याचा हुकूम व्हायची थातड का गावदेव नि गावदेवीपुढे धडाधड झाल्याच चालू कोंबड्या बकऱ्यांच्या कंदुऱ्या आणि दारूचे पाट.
पावसाचे अवर्षण पडले, खेळवा देव. गावकीचे तंटे पडले, लावा देवाला कळी आणि घ्या त्याचा निकाल. घरात मूल जन्माला आले, एकाद्याचे लग्न निघाले किंवा कोणी मेला, तरी दगड्याधोंड्या गावदेवाला कोंबडे बकरे नि दारू दिलीच पाहिजे. सारा गाव मग झिंगून तर्र! आणि हे सारे कशासाठी? तर देवधर्माच्या सांगतेसाठी. दसऱ्याला रेड्याचे बलिदान हवेच. नाहीतर रोगराईच्या तडाक्यात गावाची मसणवटी व्हायची. शिवाय, त्या रेड्याच्या बलिदानात गावमहारांचा नि गावपाटलांचा मोठ्ठा मान असायचा. पटकीचा रोग आला आणि सगळीकडे दुष्काळ असला तरी भीक मागून खंडीवेरी तांदळाच्या भाताचे गाडे भरायचे, त्यावर गुलाल शेन्दूर उधळायचा, जागोजागी कोंबडी बकरी कापीत कापीत, रक्ताचे सडे पाडीत पाडीत, मरिआईच्या गाड्याची मिरवणूक गावाबाहेरच्या वेशीवर नेऊन सोडायची. याचा अर्थ, एका गावाची इडापीडा दुसऱ्या गावाच्या वेशीवर नेऊन टाकायची असा असल्यामुळे, त्या गावचे लोक काठ्या बडगे भाले बरच्या घेऊन मरिआईच्या गाड्याला विरोध करायला अस्तन्या सरसावून उभे असतात.
आमच्या गावाच्या वेशीवर गाडा आणू नका, दुसरीकडे न्या, आणाल तर याद राखा, डोकी फुटतील. या धमक्यांच्या हाका आरोळ्या चालू होतात. गाडा कोणीकडेहि नेला, तरी कोणत्या ना कोणत्या गावाची वेस असणारच तेथे. हरएक वेशीवर गावगुंड तयारच असतात. मग काय? कचाकचीची मारामारी होते आणि प्रकरणे जातात फौजदारी कचेरीत. तालुक्याच्या वकिलांची पोळी पिकते. जखमी लोकांनी दवाखाने फुलतात. कधीकधी मारामारी टाळण्यासाठी मरिआईचा शेन्दूर गुलालानी माखलेल्या खंडीभर भाताचा गाडा तेथेच वेशीवर टाकून बैलांसकट गावकरी माघारी पळतात. कुत्री कावळे सुद्धा तो भात खात नाहीत. कुजून जातो तसाच उकिरड्यावर.
देवाधर्माच्या नावावर शहरांत नि खेड्यांत शेकडो वर्षे चालू असलेल्या असल्या प्रकारांची यादी फार मोठी नि लांब आहे. कथापुराणकार शहरी शहाण्यांना मोक्षाच्या नादी लावून लुटीत असतात आणि खेड्यापाड्यांतल्या अडाणी म्हणून मूर्ख रयतेला गावजोशी, कुलकर्णी, तलाठी, पाटील आणि देवभगत शेकडो फंदात नादाला लावून हवे तसे पिळीत छळीत असतात. काही फिरते भजनी संत खेड्यापाड्यांत गेले आणि त्यांच्या कीर्तन भजनांचा धुमाकूळ चालू झाला, का त्यांच्याहि शिकवणींत संसार असार आहे, माणसाचे जीवन पाण्याचा बुडबुडा आहे, कधी फट्कन फुटेल त्याचा नेम नाही, बायका पोरे धनदौलत घरदार शेतीवाडी सगळे इथच्या इथे रहाणार, बरोबर काही येणार नाही, अखेर चला लंगोटी छोड़ ही अवस्था.
तेव्हा या सगळ्यांचा त्याग करून पंढरीच्या वाऱ्या करा. तो पंढरीनाथ तुमचे तारण करील. रात्रंदिवस विठ्ठल नामाची गर्जना करा. एकादशीचे कडकडीत उपास करा. आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी पायी करा. असल्या उपदेशाचा तडाका चालू व्हायचा. हजारो खेडूत त्या बुवांच्या नादाला लागतात. घरदार धुऊन त्यांच्या झोळ्या भरतात. रोजगार व्यवहाराकडे पाठ फिरवून बेकार भणंग होतात. “तू तो राम सुमर, जग लढवा दें" असल्या बेफिकिरीने पंढरीचे वारकरी बनतात.
तेथेहि त्याना लुटणारे आणि कुटून काढणारे बडवे आणि भजनी टाळकुटे तयारच असतात. उपाशी तापाशी बेभान टाळ कुटीत नाचणाऱ्या असल्या कंगाल वारकऱ्याची "अहाहा, केवढी ही विठ्ठलभक्ति आणि केवढा हा नामाचा महिमा" असे म्हणून वहावा करणारे लफंगे लोक आजूबाजूला उभेच असतात. त्यांच्या चिथावणीने त्या पोकळडोक्या वारकऱ्यांना आणखीच चेव येतो आणि मोक्षाचे सारे गाठोडे या कंगाल वारकरी जीवनातच आहे, अशा समजुतीने तो त्याच भिकारड्या निष्क्रिय भीकमांग्या आयुष्याचा अभिमानी बनतो. महाराष्ट्रातले लक्षावधि धट्टेकट्टे पुरुष आणि बाया या वारकरी फंदात सापडून स्वार्थाला नि परमार्थाला सफाचट मुकलेले दृष्टीला पडतात. वारकरी पंथाने धर्म जगवला जगवला म्हणतात तो हा असा! संसारात व्यवहारात कायमच्या नालायक ठरलेल्या आणि देशाला जडभार झालेल्या लक्षावधि नादान बायाबुवांचा वेडपट समुदाय म्हणजे वारकरी पंथ, अशी व्याख्या करावी लागते.
खेडूत मूळचेच नाक्षर अडाणी म्हणून अविचारी. केवळ मेण्ढराची जात. दाढीवाल्या बोकडाच्या मागे मुंड्या खाली घालून सगळे जाणारे. तो त्यांना चरायला कुरणात नेतो का मरायला सरणात नेतो याची चौकशी ते करीत नाहीत. असले अनाडी लोक देहाच्या सार्थकासाठी (म्हणजे कशाच्या? तेहि त्यांना अवगत नसतेच) वारकरी कळपात घुसले, तर त्यांना फारसा दोष देता येणार नाही. पण आश्चर्याची गोष्ट अशी की अलीकडे गेल्या ५०-७५ वर्षांत कित्येक पांढरपेशा पदवीधर भटां बामणांनी टाळमाळधारी वारकऱ्यांचे सोंग घेऊन शिंगे मोडून वासरांत घुसण्याचा एक जंगी व्यापार चालू केला आहे. एडिटरकी, मास्तरकी किंवा प्रोफेसरकीच्या उद्योगापेक्षा हा विठ्ठले माझे आई भजनाचा आणि ज्ञानदेव तुकाराम संकीर्तनाचा धंदा त्या लोकांना चांगला किफायतशीर झालेला आहे. आधीच भटांची जात सुशिक्षित. कथा पुराणे प्रवचने सांगण्यात पिढ्यान्पिढ्या जिभली सरावलेली आणि सवकलेली. तशात पाश्चिमात्य इंग्रेजी ज्ञानाची भर. कोणताहि अध्यात्माचा मुद्दा उलट सुलट झकास विधानांनी रंगवून सांगण्याची सफाई. शहरी शहाण्यात मानकरी, म्हणून खेडूतानाहि त्यांच्या पांडित्याचा मोठा वचक, दरारा नि आदर.
असलेहि लोक जेव्हा हरिनामाशिवाय मोक्ष नाही, संसार असार आहे, बायका पोरे वैरी आहेत. अंतकाळी आपले आपण, देहाचे सार्थक करण्यासाठी या मायामोहातून बाजूला झालेच पाहिजे, असा उपदेशाचा तडाका चालू करतात, तेव्हा अडाणी खेडूतानाहि ते हडसून खडसून पटते आणि ते त्यांच्या भजनी लागतात. गुरूदेव म्हणून त्यांच्या पाया पडतात, पायांचे तीर्थ घेतात, त्यांच्या मठासाठी घरेदारे धुतात, काय वाटेल ते करतात. भिक्षुकाचा धंदा बसला. ज्योतिषावरहि पोट भरण्याची पंचाईत पडू लागली. मास्तरकी कारकुनीतहि आता काही दम राहिला नाही. म्हणून डोकेबाज भटजी वारकरी बनले. येथे मात्र त्यांना अनुयायी भगतांची उणीव केव्हाच पडत नाही. संसार असार आहे, एक हरिनाम सत्य आहे, हे बडबडत असताना, या वारकरी सोंगाच्या भटा-बामणांचे संसार मात्र आपोआप सोन्या चांदीच्या मुलाम्याने चमकत असतात. विठ्ठलनामाचा केवढा बरे हा प्रताप!
शिवपूर्वकालीं आणि कदाचित् शिवकाली, मुसलमानांच्या धार्मिक आक्रमणाला तोंड देण्यासाठी, विठ्ठलनाम संकीर्तनाने आणि पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाने, हिंदू संघटनेचे काही कार्य केले असेल, (मला तर शंकाच येते,) तरी त्यानंतर या संप्रदायाने हरएक महाठी हिंदूला माणसातून उठवण्याची आणि व्यवहारी कर्तृत्वाला मुकवण्याची दुष्ट कामगिरीच केलेली आहे. पाच पन्नास लाख लोक पिढ्यान्पिढ्या संसार व्यवहाराला रामराम ठोकून, देहसार्थकाच्या सबबीखाली आणि मोक्षाच्या आशेने गळ्यात माळा घालून टाळ कुटीत जगण्याचा धंदा करीत आढळावे, ही महाराष्ट्राच्या भवितव्यतेवरची मोठी भयंकर आपत्ति आहे.
देववादाचा फैलावा
देवधर्माच्या या टाळकुटी फिसाटाच्या जोडीनेच दुसरे एक महापाप लोकांच्या बोकांडी बसलेले आहे. ते म्हणजे दैववादाचे, जो पहावा तो दैव दैव करीत कपाळाला हात लावीत असतो. सर्व होणे जाणे तुझ्या हातीं ही देवापुढची कबूली. माणूस म्हणजे कोणी नाही. हवेत उडालेला क्षुद्र पाचोळा. त्याच्या नशिबाची वावडी देवकृपेच्या वाऱ्यावर उडणारी. त्याला स्वतःला काही कर्तृत्व नाही, दैवाच्या अनुकूलतेशिवाय त्याच्या हातून काही घडणारे नाही. दैवाचे प्रतिकूळ वारे अथवा वादळ टाळण्यासाठी देवाच्या आराधनेशिवाय दुसरा मार्गच नाही. देवभक्तीचा आटारेटा करूनहि स्वतःचे नि संसाराचे वाटोळे झाले, तरी दैवरेषेपुढे कोणाचे काय चालणार? या समजुतीचे समाधान मानायलाहि त्याची तयारी. शहरी शहाणा घ्या अथवा खेडूत अडाणी घ्या, सारे देव-दैव वादाच्या जंजाळात गुरफाटलेले. माणुसकीचीहि चाड कोणात उरलेली नाही. मग भूतदयेची शुद्ध रहातेच आहे कुणाला? "ज्या देशात भविष्यवादी ज्योतिष्यांचा धंदा भरपूर चालतो, तो देश हव्या त्या आक्रमकानी मन मानेल तेव्हा पायदळी तुडवून गुलाम करावा." हा एका पाश्चात्त्य तत्त्वज्ञाचा इषारा भारताच्या इतिहासाला अगदी फिट लागू पडतो.
देव-दैव-वादाच्या भ्रमाने आमची मनेच साफ मारून टाकली आहेत. कोणी कितीहि शिकलेला असो, भविष्य पाहिल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. या एकाच नाजूक भावनेचा पुरेपूर फायदा धंदेबाज ज्योतिषी आणि अलीकडचे वृत्तपत्रकार घेतात आणि पोटे भरतात. म्हणजे दैववादाने आमच्या लाज शरमेचेहि वाटोळे केले, असे म्हणायला हरकत नाही. खेडेगावांत ग्रामजोशीचा थाट दर्जा नि अधिकार सांगायलाच नको. पाळण्यापासून सरणापर्यंत, फार काय सरणावर जळून खाक झाल्यानंतरहि, त्याच्या पंचांगातील मुहूर्तांवर, ग्रहमानावर आणि सल्ल्यावर खेडूताचे जीवन चाललेले. त्याने साडेसाती वर्तवली का मारुतीच्या तेल शेन्दूरासाठी आणि शनवारच्या एकादशणीसाठी, लागलीच जोशीबुवांची कातरणी खेडूताच्या फाटक्या खिशाला.
देवांचे नवस हासुद्धा दैववादाच्या पोटी जन्मलेल्या व्यसनांचा एक भाग आहे. अमूक झाले तर सत्यनारायण करीन. कोंबडे बकरे देईन. भट भोजन घालीन. असल्या नवसांनी आपण देवाशी व्यापारी बहाणा करतो, याचे आजहि कोणाला भान असल्याचे दिसत नाही. नवस केला का काम फत्ते, हीच ज्याची त्याची समजूत. मुलांसाठी नवस, जुगारीसाठी नवस, नोकरीसाठी नवस, बायको मिळण्यासाठी आणि मिळालेली पळाल्यास परत येण्यासाठी नवस, परीक्षेत पास होण्यासाठी नवस, खटला जिंकण्यासाठी नवस, आजारातून बरे होण्यासाठी नवस, अशा नवसांच्या परवडी सांगाव्या तेवढ्या थोड्या.
या नवसांची एक मजेदार गोष्ट ऐका. पुणे शहरांत मारुती नि म्हसोबा यांची गचडी फार. त्यांची नावेहि चमत्कारिक नि कित्येक तर अश्लील असतात. कचकावून नवसाला पावणारा म्हसोबा पुण्याला जसा आहे, तसा एक शेण्या मारुती शनिवार पेठेत आहे. परीक्षेची पोरे त्याला नवस करतात. “देवा बाप्पा मारुतीराया, मी पास झालो तर तुला शेन्दूर पेढे वाहीन.” मारुतीचा आणि परीक्षेचा संबंधच काय? काही पोरटी पास होतात, बरीचशी नापास होतात. पास होतात ती मारुतीला शन्दूर फासून लालेलाल करतात. मागाहून नापास झालेली पोरटी येतात आणि त्या शेन्दरावर शेण थापून मारुतीला माखतात. पासवाल्यांचा शेन्दूर आणि नापासवाल्यांची कचकावून शेणथापणी अशा दुहेरी रंगरंगोटीने त्या मारुतीच्या मूर्तीचे हालहाल होतात.
देववादाच्या पाठपुराव्यासाठी निपजलेल्या दैववादाने हिंदू लोकांची अतोनात अवनति केलेली आहे. दगड-माती-धातूचे देव-देवी आणि त्यांच्यासाठी देवळांची पैदास भरंसाट झाल्यामुळे, माणूस स्वतःशी तर बेमान झालाच, पण माणुसकीची किंवा भूतदयेचीहि त्याला कसली पर्वा अथवा संवेदना राहिलेली नाही. हिंदुस्थानातले हिंदुधर्मी लोक हव्या त्या जुलुमाला, अन्यायाला नि गुलामगिरीला मिटल्या तोंडी सहन कसे नि कां करतात? याचे कोडे विचारवंत चिकित्सक पाश्चात्त्यांना बरेच वर्षे सुटत नव्हते. सत्याची चाड नाही, असत्याची अन्यायाची चीड नाही, हवा तो आक्रमक येतो आणि बेलाशक त्याना तुडवून शिरजोर होतो. पण हे लोक हूं चूं काही करत नाहीत! आजवरच्या परक्यांच्या सर्व भारतीय आक्रमणाचे गूढ हिंदूंच्या या दैववादी पिण्ड प्रकृतीतच सापडते.
एवढे मोठे शूर पराक्रमी रजपूत राजे. मोगलांचा किल्ल्याला वेढा पडला, त्यांची बाणाबाणी गोळा गोळी चालू झाली, तरी ज्योतिष्याला बोलावून प्रतिकाराचे तोंड कधी नि कोणत्या मुहूर्तावर द्यायचे याचा त्याला सल्ला विचारीत असत. असल्या नादान दैववादी राजवटीचा मोगलांनी चकणाचूर केला नसता तरच ते एक मोठे आश्चर्य झाले असते. कर्तबगारी थंड पडली का माणूस कुंडल्यांतल्या शनि-मंगळदि ग्रहांची चौकशी करू लागतो. या एकाच रोगाने महाराष्ट्र सध्या पुरा पछाडलेला असल्यामुळे, हरएक क्षेत्रात त्याची पिछेहाट होत चालली आहे. “निवडणुकीत यशस्वी होईन का?" याचे ग्रहमान पाहून उत्तरासाठी १० रुपयांची मनिऑर्डर पाठवा, अशी एका पुण्याच्या ज्योतिष्याची केसरीतली जाहिरात पाहिल्यावर हा दैववादांचा रोग किती भडकलेला आहे, याची खात्री पटली.
देवळांचा सुळसुळाट
धर्मांची देवळे नि देवळांचा धर्म हे एक हिंदू धर्माचे आणि समाजस्वास्थ्याचे महाभयंकर पाप होऊन बसले आहे. हिंदुस्थान दरिद्री झाला, मातीतून सोने काढणारा शेतकरी वर्ग भिकेला लागला, देशी धंदे ठार मेले, मध्यमवर्ग नामशेष झाला, शिक्षित पदवीधरांची बेकारी बोकाळली, असला आरडाओरडा करण्यातच राजकारणी अकलेच्या कवायती करणाऱ्या ब्रह्मांडपंडिताना हिंदूच्या देवळात किती अपार संपत्ति निष्कारण अडकून पडली आहे आणि तिचा उपयोग गोरगरिबांच्या उद्धारासाठी न होता, लुच्च्या लफंग्या चोर जार ऐदी हलकटांच्या चैनीसाठी कसा होत आहे, याची दखल घेण्याची अक्कल अजूनहि सुचलेली नाही. दुष्काळाने कोट्यवधि लोक अन्न अन्न करून मेले तरी देवळांतल्या दगडी देवांना शिरा केसरी भाताचा नैवेद्य अखंड चालूच आहे. लाखो श्रमजीवी कर्तबगार तरुण उदरंभरणासाठी भयाभया करीत फिरत असले, तरी अब्जावधि रुपयांचे जडजवाहीर आणि सोन्यामोत्यांचे दागिने देवळी देवांच्या आंगावर चढलेले आहेतच.
देशातला शेतकरी नि कामकरी कळणा कोंड्याला नि घोंगडीच्या ठिगळाला महाग होऊन देशोधडीला लागला तरी देवळांतल्या पुजारी सेवेकरी नि बडवे भटसेनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला तिळाएवढाहि खळगा आजवर कधी पडला नाही. “विद्येची चार अक्षरे शिकवा हो शिकवा" असा शेकडा ९६ जीवांचा गेली शंभर वर्षे सारखा कण्ठशोष चालला असतांहि देवळांतल्या घुमटांखाली लाखो महामूर्ख भट गोसावडे गंजड भंगड नि टंगे गंध भस्म रुद्राक्षांच्या पुण्याईवर पोट फुटून वांति होई तों परार्धावरी पल्ले धान्यांचे बिनबोभाट फडशे पाडीत असतात. देवळांच्या छपरांखाली ब्रह्मचाऱ्यांचे वंश किती वाढतात, पति नसतानाहि किती विधवा पुत्रवती होतात, किती गोसावडे सावकारी करतात, किती गुरुमहाराजांचे मठ गोकुळकाल्याच्या चिखलात कटिबंध बुडतात आणि किती पळपुट्या छंगीभंगी टग्यांचे थर तेथे खुशालचेण्डूप्रमाणे निर्घोर जीवन कंठीत असतात याची, स्वतःच्या किंवा पूर्वजांच्या स्मारकांसाठी देवळे बांधणारांनी आणि देवळे म्हणजे धर्मस्थाने समजून आंधळेपणानी त्यांची जोपासना करणारांनी दखल घ्यायला नको काय?
आज देव देवळांच्या निमित्ताने अब्जावधि रुपयांची संपत्ति हिंदुस्थानात निष्कारण अडकून पडलेली आहे. आणि इकडे आमच्या भारत राष्ट्राचा पाय आंतर्राष्ट्रीय कर्जाच्या बिनबुडाच्या खळग्यात खोल खोल जात आहे. या परिस्थितीचा एकाहि मुत्सद्याने किंवा संताने विचार केलेला दिसत नाही. अनाथ बालकाश्रम, अनाथ विधवाश्रम, गोरक्षण, कुष्ठरोगी लंगडे पांगळे यांचे आश्रम, मागासलेल्या समाजांतील मुलामुलींचे शिक्षण, कितीतरी समाज जीवनाच्या जगण्यामरण्याचे प्रश्न आहेत. ते सोडवणारांना घरोघर दारोदार भीक मागावी लागते आणि देव आणि देवळांच्या दगडी प्रतिष्ठेसाठी करोडो रुपयांची संपत्ति शतकानुशतके तळघरात गाडलेली रहाते. या नाजूक मुद्याचा आजवर एकालाहि घाम फुटलेला नाही.
देश-देव-धर्माच्या या असल्या विलक्षण आणि माणूसघाण्या परिस्थितीच्या पार्श्वभागावर उभे राहून डेबूजी गाडगेबाबांच्या सेवा धर्माची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. मोठमोठ्या शहरांपासून तो ५-१० झोपड्यांच्या कोनाकोपऱ्यांतल्या खेड्यापर्यंत सर्वत्र भटकंती करीत असताना त्यांची समाज जीवनाची बारीक सूक्ष्म टेहळणी सारखी चाललेली होती. अत्यंत मागासलेल्या शेतकरी खेडूती समाजात त्यांचा जन्म, त्या समाजाच्या मानसिक शारीरिक आर्थिक सर्व हालअपेष्टांचा त्यांना पुरा अनुभव. रक्त थिजून हाडे पिचेपर्यंत शेताची माती तिंबवली तरी सुखाचा घास तोंडात पडत नाही. वरिष्ठ वर्गाची गुलामगिरी पिढ्यान्पिढ्या अखंड चालूच. देवाधर्माच्या आणि रूढींच्या नावावर जागोजाग पशुपक्ष्यांची हत्या बेगुमान चाललेली, गरिबांनी मरावे नि श्रीमंतानी मनमुराद चरावे हा समाजव्यवस्थेचा दण्डक. गरिबांना गरिबीची लाज नाही. खंत नाही. जीवन सुधारण्याची महत्त्वाकाक्षांहि नाही. नाक्षर अडाणी म्हणून अस्ति नास्ति विचार करण्याची अकलेला सवय नाही. ताकद नाही. "ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान."
महार मांगादि जमातीनी इतरांपासून दूर खातेऱ्यांतच का रहावे? कुष्ठरोगी वेडे लुळे पांगळे यांची समाजाने कसलीहि दाद कां घेऊ नये? देव देवळांचा जागोजाग एवढा ऐश्वर्याचा बडीवार चालला असतांहि, गोरगरिबांच्या तोंडांत वर्षांतून एकदाहि कोणी साखरेची चिमूट, गुळाचा खडा किंवा तुपाचा थेम्ब कां घालू नये? यात्रेच्या ठिकाणी भिक्षुक बडव्यांचा मनस्वी त्रास जाच सोसूनहि लाखो लोक मेण्ढरांसारखे कां जातात? तेथे त्यांच्यापासून पैसे उकळून काढले जातात, पण अन्नपाणी आसऱ्याची निवाऱ्याची सोय कां करीत नाहीत? अशा शेकडो प्रश्नांचे डेबूजी आपल्या मनाशी चिंतन करीत असे.
तीक्ष्ण निरीक्षणांचे सिद्धांत
हजारो खेडी गावे नि शहरे पायदळी तुडवीत डेबूजीची भटकंती चालू असताना, समाजातील हर एक लहान मोठ्या घटनेचे त्याचे तीक्ष्ण निरीक्षण अखंड चालू होते. लोकांचे कोठे काय चुकते? त्यांना कोण कसे नि कां चुकवते? काय केले असता अडाणी नि भोळा बहुजनसमाज जागा होऊन आपल्या शेकडो ठकवर्णीच्या कर्ता-कर्म क्रियापदांचा शोध आणि बोध घेईल? हे एकच विचारांचे चाक त्याच्या मस्तकात सारखे भिरभिरत असायचे आणि आजहि ते तसेच भिरभिरत असते. हरघडी आपल्या नजरेसमोर शेकडो अमंगल अनीतिमान नि अन्यायी गोष्टी घडतात. चालायचेच हे असे. त्याला कोण काय करणार? अशा बेदरकार वृत्तीने आपण कानाडोळा करून पुढे जातो. डेबूजी तराल्या घटनेचे निरीक्षण चिंतन मनन करीत तिथेच उभा रहायचा आणि चटकन हवा तो धोका पत्करून ती घटनेची गाठ सोडायला, फोडायला किंवा तोडायला धावायला. याचा एकच दाखला पहा.
एका नाक्षर महाराचा मुलगा मुंबईला कामावर गेला होता. पुष्कळ दिवस त्याचे खुशालीचे पत्रच नव्हते. एकदा ते आले. खेड्यात वाचणारा शहाणा कोण? तर कुळकर्णी महाराज. "दादा, पोरांचं काय पतर आलाय ते जरा वाचूनशी दावा, पाया पडतो.” महाराचे ते पत्र कुळकर्ण्याने घेतले. "ही माझी लाकडे दे फोडून आधी, मग दाखवतो वाचून." कुळकर्णी बोलला. “पण पोरगा खुशाल तर आहे ना दादा?” "आधी लाकडे फोड. मग सांगेन पत्र वाचून." तास दीडतास खपून त्याने दीड दोन गाडाभर लाकडे फोडून ढिगार रचला. “पोरगा खुशाल आहे ना, एवढं तरी सांगा दादा" अशा सारख्या विनवण्या तो महार मधूनमधून करीत होता. पण प्रत्येक विनवणीला एक शिवी हासडून, "आधी लाकडं फोड, गाढवा.” असा कुळकर्ण्याचा तडाखा चालू. बिचारा महार आधीच उपाशी. पाण्याचा घोट मागितला तरीहि शिवी आणि “काम पुरे कर आधी.” ही दटावणी.
अखेर दोन तीन कठीण गाठीचे ओंडके त्याला फुटेनात. जीव कासावीस होऊन तो घामाघूम मटकन खाली बसला "दादा, तुम्हाला वाचायचे नसेल तर परत द्या, घेतो आणखी कुठून तरी वाचून. पण या गाठी फोडण्याची ताकद नाही मला." "गाठी फुटत नसतील तर पत्राहि देत नाही परत जा, चालता हो." कपाळावर हात मारून महार परत फिरणार, तोच चिंध्या मडकेघारी डेबूजीबुवाची स्वारी तेथे आली. दुरून बराच वेळ त्याने तो कुळकण्याच्या बेमाणुसकीचा तमाशा पाहिला होता, "आण रे बाबा इकडे तुझी कुऱ्हाड, डेबूजीने कुऱ्हाडीचे जोरदार तडाखे मारमारून त्या सगळ्या गाठीच्या ओंडक्यांचे तुकडे केले, स्वतः राशीवर साठवले आणि कुळकर्णी महाशयाचे कदरबाज नजर रोखून म्हटले, "काय दादाजी, आता देता का नाही या महाराचे पत्र परत त्याचे त्याला" कुळकर्ण्याने पत्र न वाचताच परत केले. डेबूजी त्या महाराला म्हणाला, "बाबा, तू नि मी दोघेहि गाढव आहोत, चार अक्षरं शिकलो असतो, तर तुझी अवस्था ही अशी कशाला असती आणि माझीहि अशी कां असती? शिक्षणाशिवाय माणूस धोंडा!"
या वेळेपासून डेबूजीने आपल्या कीर्तनात शिक्षणाच्या माहात्म्यावर जोरदार प्रवचने करण्याचा परिपाठ चालू ठेवला तो आजपर्यन्त अखंड चालू आहे. गाडगेबाबांनी जागोजाग अनेक शाळा चालवल्या आहेत. स्कॉलरशिपांसाठी फंड जमा करून दिलेले आहेत. गयावळ पंडे नि बडवे खोट्यानाट्या नरक-मोक्षाच्या थापा मारून काशीमथुरा-प्रयागाच्या यात्रेतहि लोकांना कसकसे लुबाडतात, हे स्वतः अभ्यासले. महाराष्ट्रातल्या यच्चयावत् तीर्थ क्षेत्रांचा पोटभरू महिमा तर त्याच्या नित्याच्या परिचयाचा. देव-देवळांच्या थोतांडाबरोबरच जागोजाग चालू असलेली बुवाबाजी, स्वप्ने साक्षात्कार दृष्टांत नवस गुरुपदेश समाध्या आरत्या यांचा माजलेला धुमाकूळ आणि त्या थोतांडात साक्षर पदवीधरांपासून तो सहीनिशाणी आंगठा दाखवणाऱ्या अडाणी खेडूतांपर्यंत गुरफटलेला समाज, या भानगडीहि त्याच्या तीक्ष्ण चिकित्सक नजरेतून सुटल्या नाहीत.
एकीकडे साक्षात्कार दृष्टांत अनुभव आणि मोक्षसिद्धीच्या खटपटींचा बाजार उसळला आहे आणि दुसरीकडे पहावे तो माणसेच माणसाना खायला उठलेली! देवाधर्माच्या नावावर जागोजाग प्राणिहत्या अखंड चाललेली! तिळाएवढ्या स्वार्थासाठी ईश्वरसाक्ष खोटे बोलणाऱ्यांची चालली आहे भरभराट आणि हाडांची काडे करून मिटल्या तोंडी कष्ट मेहनत करणारांची अखंड मुस्कटदाबी! झोपडीतला मडकी गाडग्याचा संसारसुद्धा नीट चखोट करण्याचा आवाका कोणात नाही. नाक्षरांच्या अडाणीपणावर साक्षरांनी चरावे. त्यांनाहि आणखी वरचढानी मनमुराद तुडवावे. भल्याची दुनियाच नाही. ही विचित्र परिस्थिति बदलली पाहिजे. अडाणी जनतेला अध्यात्माच्या बुवाबाजी खुळापासून मुक्त करून, व्यवहाराच्या चोख कर्तव्यकर्माच्या राजमार्गावर आणून उभे केले. पाहिजे; या एकाच ध्येयाने डेबूजीने आपल्या कीर्तन प्रवचनांच्या धोरणाची दिशा स्पष्ट आखून घेतली.
खबरदार, पायाना हात लावाल तर
कीर्तनकार पुराणिक काय किंवा अध्यात्माच्या आवरणाने बनलेले साधू संत महंत काय, त्यांच्या पायांचे दर्शन आणि तीर्थ घ्यायला लोक नेहमीच धाधावले आढळतात. आणि तेहि पठ्ठे समाजाच्या मनोभावनांचा अंदाज घेऊन, डोई टेकून नमस्कारासाठी आपापले पाय पुढे करतात. कित्येक संत नमस्काराला आलेल्या भगतांच्या डोक्यावरच आपले पाय ठेवतात. असे झाले म्हणजे झाले बुवा, पावन झालो, भवसागरातून मुक्त झालो, जन्म-मरणाचा फेरा चुकला, जीवन धन्य झाले, अशा समजुतीने भगत हुरळतात, डेबूजी गाडगेबाबानी या अंधश्रद्धेच्या प्रघाताला पहिल्यापासून अगदी निकराने विरोध केलेला आहे. भेटेल त्याला ते स्वतः दोन हात जोडून मस्तक वाकवून दुरून प्रणाम करतात. पण कोणालाहि आपल्या पायाना हात लावू देत नाहीत. माणसांनी माणसांच्या पायांवर कां म्हणून डोके ठेवावे? आदर काय दुरून दाखवता येत नाही? अशी त्यांची आचार-विचार सरणी आहे.
ना बुक्का, ना माळ, ना मिठ्या
कीर्तन संपल्यावर कथेकरी बुवाच्या पायांवर लोळण घालण्याचा आणि आरतीत दिडक्या पैसे टाकल्यानंतर बुवाना आलिंगन द्यायचा एक जुना हरदासी प्रघात आहे. गाडगेबाबांच्या कीर्तनात ना बुवा, ना माळ, ना मिठ्या. तरीसुद्धा बाबांच्या कीर्तनातल्या हृदयस्पर्शी प्रवचनाने भारावलेल्या नि थरारलेल्या श्रोत्यांना त्यांच्या पादस्पर्शाची अपेक्षा नेहमीच मोठी. ती टाळावी म्हणून कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी गाडगेबाबा जवळपास एकादी गुपचूप दडून बसण्याची जागा आधीच हेरून ठेवतात. अखेरचा हरिनामाचा कल्होळ चालू करून दिला का सट्कन निसटून त्या जागी दडून बसतात. पुंडलीक वरदा हारि विठ्ठल होऊन लोक पहातात तों काय? गाडगेबाबा गडप, गुप्त, अदृश्य! भराभर लोक त्याना शोधायला सैरावैरा धावायचे. कित्येक वेळा त्यांच्या दडणीच्या जागेवरूनहि जायचे. अखेर, बुवा देवावतारी झाले. गुप्तच झाले. अशा कण्ड्या पिकायच्या नि भोळसट त्या खऱ्या मानायचे.
अनेक वेळा `कीर्तन आटोपल्यावर मला तुझे कांबळे दे बरं का पांघरायला थोडा वेळ` असे कुणाला तरी आधीच सांगून ठेवायचे आणि दडायची वेळ आली का ते कांबळे पांघरून घुंगट मारून तिथेच कुठेतरी काळोखात बसून रहायचे. कांबळे काळे नि काळोखहि काळाच. इकडे बुवा गुप्त झाले म्हणून लोकांची उगाच धावपळ. अशा वेळी आता विनोदाचीहि हुक्की यायची. "अहो, तो गोधड्याबुवा कुठं लपलाय ते मी दाखवतो चला,` असे कांबळ्याच्या घुंगटातूनच काही लोकांना ते स्वतः सांगत. त्यांना वाटायचे का हा कुणीतरी असेच खेडून श्रोत्यांपैकी एकादा घोंगड्या शेतकरी. लोक म्हणायचे - होय, तर. तो लागलाय असा सहज सापडायला. देवरूपी तो. गेला पार कुठच्या कुठं पारव्यासारखा उडून. मग बुवाजी हळूच कांबळे बाजूला सारून प्रकट व्हायचे नि म्हणायचे, “अहो बाप्पानो, माणूस कधी एकदम असा गुप्त होईल काय? बोल बोलता तो काय हवेत विरून जाईल? बामणांची पुराणं ऐकून ऐकून भलभलत्या फिसाटावर विश्वास ठेवण्याची लोकांची खोड कधी सुटणार कोण जाणे!”
अनेकनामी साधू
डेबूजीच्या या प्रांतोप्रांतीच्या भटकंतीत ठिकठिकाणचे लोक त्याला निरनिराळ्या नावांनी ओळखू लागले. वऱ्हाडात त्याला डेबूजीबुवा किंवा वट्टीसाधू म्हणतात. नागपुराकडे चापरेबुवा म्हणतात. मद्रास नि कोकण विभागात गोधडेमहाराज. सातारा जिल्ह्याकडे लोटकेमहाराज. गोकर्णाकडे चिंधेबुवा. खानदेश पुणे बडोदे कराची मोंगलाईत गाडगे महाराज इत्यादि अनेक नावांनी ते ओळखले जातात. सहवासातील नि निकट परिचयातील मंडळी त्यांना श्रीबाबा किंवा नुसते बाबा म्हणतात.
डेबूजीच्या कीर्तनातली नवी जादू
सर्व प्राणी भवसागरात जेहत्ते पडले आहेत, असा हरदासाने गंभीर ध्वनि काढून कथेला प्रारंभ करताच, हा एकटा हरदासच तेवढा काठावर धडधाकट उभा नि बाकीचे सगळे जग समुद्रास्तृप्यन्तु झाले असे कोणीहि शहाणा कधी मानीत नाही. कथा-कीर्तन- पुराणकारांची ब्रह्ममायेची नि समाधिमोक्षाची बडबड सुद्धा एक ठराविक संप्रदाय म्हणूनच एका कानाने ऐकतात नि दुसऱ्याने बाहेर सोडतात. त्यात त्यांना ना कसले आकर्षण, न आवड, ना काही राम. जुलमाचा रामरामच असतो तो! त्याच पौराणिक कथा नि तीच आख्याने आणि तेच बिनकाळजाचे पोपटपंची निरूपण. डेबूजीच्या कीर्तनातल्या आख्यान व्याख्यानांची तऱ्हाच न्यारी. भूतकाळाच्या अंधारात चाचपडण्यापेक्षा, वर्तमानकाळच्या गचांडीलाच त्याचा नेमका हात. हरिश्चंद्राचा नि नळ-दमयंतीचा वनवास कशाला? खरे खोटा, तो झाला गेला, कालोदरात गडपला.
समोर कीर्तनाला बसलेल्या हजारो शेतकरी कष्टकऱ्यांच्या वनवासावर नि उपासमारीवर त्याचा कटाक्ष. अडाणीपणामुळे डोकेबाज सावकारशाही त्याना कसकशी फसवून लुटते. अनाक्षरतेमुळे गहाण फरोक्ताचा भेद कसा उमगत नाही. आपली बाजू खरी न्यायाची असूनहि खेडूत लोक कोर्टकचेरीच्या पायऱ्या चढायला कसे घाबरतात नि सावकार म्हणेल ते मेण्ढरासारखी मान डोलावून कबूल करतात. गोडगोड बोलून रोजंदारीचा ठरलेला १२ आणे दाम हातावर ८ आणे टिकवून, तो कसा फसवतो. अखेर स्वतःच्या मालकीच्या शेतीवर शेतकऱ्याला आपला गुलाम बनवून कसा राबवतो आणि धान्याच्या भरल्या राशीपुढे उपाशी कसा मारतो, या अवस्थेचे शब्दचित्र आपल्या बाळबोध गावंढळ भाषेत तळमळीनी रंगवू लागला का हजारो खेडूतांच्या डोळ्यांतून ढळढळा आसवांचे पाट वाहू लागायचे. “तुम्ही निरक्षर राहिलात ते बस्स झाले. पण आता आपल्या मुलांमुलींना शिक्षण देऊन हुशार करा. गावात शाळा काढा." हा त्याचा उपदेश श्रोत्यांच्या थेट काळजाला जाऊन भिडायचा.
कीर्तनांतले तत्त्वज्ञान
परंपरेच्या ठराविक चाकोरीबाहेरचे नव्या विचारांचे तत्वज्ञान बहुजनसमाजाच्या गळी उतरवणे फार मोठे कठीण काम. मोठमोठ्या धर्म-पंथ-संस्थापकांनी हात टेकले आहेत. सत्यशोधनाचा नवा वळसा दिसला रे दिसला का बहुजनसमाज सटकलाच लांब दूर. पण डेबूजी गाडगेबाबांची शहामत मोठी ते आपल्या तत्वचिंतनातले सत्यशोधक विचार बेडरपणाने बेधडक लोकांच्यापुढे कीर्तनांतून मांडतात आणि लोकांना ते पत्करावे लागतात. पट्टीच्या शहरी पंडिताना आजवर जे साधले नाही ते गाडगेबाबांनी करून दाखवले आहे आणि महाराष्ट्रभर आपल्या सत्यनिष्ठ अनुयायांची पेरणी केलेली आहे. टाळकुटया भोळसट वारकऱ्यांपासून तो कट्टर शहरी नास्तिकांपर्यंत सगळ्या दर्जाच्या नि थरातल्या आबालवृद्ध स्त्रीपुरुषांना गाडगेबाबा ३-४ तास आपल्या रसाळ कीर्तनाच्या रंगात कसे गुंगवून टाकतात, याचे शब्दचित्र काढणे माझ्या ताकदीबाहेरचे आहे. तो अनुभव ज्याचा त्यानंच स्वतः घेतला पाहिजे. तेव्हा, दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी त्यांच्या कीर्तनातले काही ठळक मुद्दे या ठिकाणी नमूद करतो.
१) देवासाठी आटापिटा
बरं आता, देव म्हणजे काय? हे सांगणं कठीण आहे बाप्पा. शास्त्र पुराणं वेद यांचं हे काम माझ्यासारख्या अनाडी खेडवळाला कसं बरं ते सांगता येणार? पण माझ्या इवल्याशा बुद्धीप्रमाणे सांगतो. पटतं का ते पहा. हे सगळं जग निर्माण करणारी आणि ते यंत्रासारखे सुरळीत ठेवणारी आणि अखेर ते लयालाहि नेणारी एकादी महाशक्ती असावी.
तिला आपापल्या कुवतीप्रमाणे प्रत्येक धर्माने काहीतरी नाव नि रूप दिलेले आहे. नावरूपाशिवाय माणसाची समजून पडत नाही. बरं आता देव कुठं आहे? संतशिरोमणि तुकोबाराय म्हणतात,
देव आहे तुझ्यापाशी । परि तू जागा चुकलाशी ।।
माझे भक्त गाती जेथे । नारदा मी उभा तिथे ।।
अशी एक कथा आहे की देवाचा महान भक्त नारद याने देवाचा ठावठिकाणा पत्ता विचारला. त्यावर देव सांगतात, का मी वैकुंठात नाही कैलासात नाही; कुठंहि नाही. मग पत्ता? तर देव सरळ पत्ता देतात, ह नारदा, माझे भक्त माझे गुणगान कीर्तन करीत असतील, तेथे द्वारपाळाची नोकरी करीत मी उभा आहे. मला दुसरीकडं कुठं हुडकण्याची नि पहाण्याची खटपट नको. देवाची जागा आपल्याला मालूम असताना आपण भुरळलो. भलभलत्या फंदाच्या नादी लागून भटकत आहोत. इस्लाम धर्मात एक पुरावा आहे. बंदे! तूं क्यूं फिरता है ख्वाब में, मैं हूं तेरे पास.
आपण हे सारं टाकलं आणि देवासाठी जत्रा यात्रा तीर्थक्षेत्रे धुंडाळू लागलो. यावर संतांचे इशारे काय आहेत पहा.
जत्रा फत्तर बिठाया । तीरथ बनाया पाणी ।
दुनिया भई दिवाणी । पैसेकी धुळधाणी ।।
काशी गया प्राग त्रिवेणी । तेथे धोंडा पाषाण पाणी ।।
तीर्थवासी गेले आणि दाढीमिशा बोडून आले ।।
पाप अंतरातले नाही गेले । दाढी मिशीने काय केले ।।
भुललो रे भुललो. आपण सारे भलतेच करू लागलो. तुकोबाराय म्हणतात.
शेन्दूर माखोनिया धोंडा । पाया पडती पोरे रांडा ।।
देव दगडाचा केला । गवंडी त्याचा बाप झाला ।।
देव सोन्याचा घडविला । सोनार त्याचा बाप झाला ।।
सोडोनिया खऱ्या देवा । करी म्हसोबाची सेवा ।।
दगडाला चार दोन आण्याचा शेन्दूर फासून बायका मुलं घेऊन त्याच्या पाया पडता, तोंडात राख घालता, कायरे बाप्पा तुमची अक्कल? देवमूर्ती घडवणारे पाथरवट आणि सोनार हे तुमच्या देवाचे बाप का होऊ नयेत? चुकला. आपला रस्ता साफ चुकला. आपण खड्याकडं चाललो आहोत. म्हसोबा मरीआईपुढं बचक बचक राख तोंडात टाकणारे धनी कधी हुशार सावध होतील देवच जाणे. आता आपलं सगळंच कसं फसत चाललंय ते पहा.
सवाल - जगात देव किती आहेत?
जवाब (श्रोत्यांचा) - एक.
सवाल - देव एकच आहे, हे जर खरं तर आता खोटं बोलायचं नाही हो बाप्पा. आपल्या गांवी खंडोबा आहे का नाही? (आहे) मग आता देव किती झालं? (दोन) आपल्या गावी भैरोबा आहे काय? (आहे) आता देव किती झालं? (तीन) आपल्या गावी मराई आहे का नाही? (होय, आहे) आता देव किती झालं? (चार) आपल्या गावी म्हसोबा आहे का नाही? (आहे) आता देव किती झालं? (पांच) पहिलं म्हणत होता देव एकच आहे म्हणून. मग हा कारखाना कुठं सापडला? आणि याची वाढ कुठवर लांबणार? अशा लोकांना तुकोबा म्हणतात, "वेड लागलं जगाला देव म्हणती धोंड्याला." मेण्ढे आहोत आपण. काही ज्ञान नाही.
एका तोंडाने म्हणायचे का देवाने आपणा सगळ्यांना आणि जगाला निर्माण केलं आणि गावोगाव पहावं तर दगडाना शेन्दूर फासून हजारो लाखो देव तयार करण्याचा कारखाना आम्ही चालू ठेवलाय. अहो बाप्पानो, दगड धोंड्याना नुसता शेन्दूर फासून जर त्याचा देव होत असेल आणि तो नवसालाहि पावत असेल, तर मग एक चांगला मोठा डोंगर पाहून सपाटेबाज शेन्दूर फासून त्याचा टप्पोरेबाज भला मोठा देव बनवता येईल आणि तो आपले मोठमोठाले नवस पण फडशा पाडीत जाईल. मग काय? शेती नको, कष्ट मेहनत नको, गुरंढोरं नको, त्या देवापुढं ऊद धुपाचा एक डोंगर धुपाटला का आपोआप शेती पिकून तयार. जमलं का हे असं केलं तर? (नाही, नाही, नाही) तर मग हा धंदा लबाडीचा आहे.
२) साकार निराकाराचा वांझोटा वाद
अखिल विश्व निर्माण करणारा आणि ते सुयंत्र चालवणारा कुणीतरी असावा. त्याला देव म्हणा, परमेश्वर म्हणा, काय वाटेल ते नाव द्या. पण तो चार हातांचा आहे, आठ हातांचा आहे, भक्तांना स्वप्नांत दर्शन देतो, मोठा प्रकाश पडतो, भक्तांना साक्षात्कार होतात, या गोष्टी थोतांडी आहेत, असा बाबा सिद्धांत सांगतात. "स्वतःची बुवाबाजी माजविण्यासाठी या थोतांडाचा मतलबी लोक मोठा व्यापार करतात. त्यापासून शहाण्याने सावध असावे."
"माणूस देवाचे चित्र काढतो, मूर्ती बनवतो आणि आपलेच चित्र उभे करतो आणि त्याला देव समजून लोटांगणे घालतो. माणसासारखाच देव असता, तर देवाला साधते ते माणसानांहि साधले असते. देव सगळ्यांना सारखा पाहणारा. किडी मुंगीपासून सगळ्यांवर त्याची दया सारखी. मग अमक्याला दर्शन दिले नि तमक्याला द्यायचे नाही, असला भेदभाव त्याच्यापाशी कां असावा? माझी खात्री झाली आहे कीं देव साकार नाही आणि निराकारहि नाही. तो कुणाला दर्शन देत नाही. व्हायचंच नाही ते." दर्शनाची, स्वप्नाची, साक्षात्काराची नि प्रकाश दिल्याची सारी सोंगेढोंगे आहेत.
"देव दिसणारच कसा? तो कसा आहे, हेच मुळी आजवर कुणाला उमगलेले नाही. मोठमोठे ऋषि मुनि होऊन गेले. `आम्हाला हे देवाचे गूढ समजले नाही हो नाही.` हे त्यांनी चक्क कबूल केले. तरीहि या देवदर्शनाच्या नि साक्षात्काराच्या गप्पा चालूच आहेत. खोट्या आहेत त्या साऱ्या."
३) आंगांत येणारे देव
तुमच्याकडं देव आंगात येतात का? (होय, येतात.) आजवर देव कुणाच्या आंगात आला नाही, येत नाही आणि येणार पण नाही. तुम्हा आम्हाला देवाच्या रंग रूपाचा नाही ठाव ठिकाणा, असा तो देव माणसाच्या आंगात येईलच कसा? आंगात देव आल्याचे सोंग करणाऱ्या घुमाना नि आंगारे देणाऱ्याना चांगले फैलावर घ्यायचे सोडून, आपण त्यांच्यापुढं नाकदुऱ्या काढतो. देवा असं कर, तसं कर म्हणतो. कसला हा अडाणीपणा? देव आंगात आणण्याच्या कामी पहिला नंबर बायांचा, दोघी चौघी जमल्या, एक ऊदकाडी पेटवली, नाकात थोडं धुपट गेलं का झाली नाचा उडायला नि घुमायला सुरुवात. ज्या बाईच्या आंगात येतं तिचा नवरा हवा चांगला खमक्या मर्दाना.
पण हा असतो मसाड्या. बाई नाचायला उडायला लागली तर हा धुपाटण्यात ऊद घालून तिच्यापुढं नमस्कार घालतो. मग त्या बाईला येतो डबल जोर. ती जोरजोरात नाचायला लागते. याला औषध फार सोपं आहे. पण त्या बाईचा नवरा खरा मर्दाना पाहिजे. आपली बायको लाजलज्जा गुंडाळून नाचायला लागली का एका बाजूने जाऊन त्याने तिच्या अरशी सज्जड थोबाडीत भडकावून द्यावी, एका थपडीत तिचा घुमारा बंद. शकून सांगणारे, आंगारे धुपारे देणारे, ताईत गण्डेदोरे बांधणारे आणि हे घुमारे यांच्या सावलीतसुद्धा जाता कामा नये, यांच्या नादी लागला त्याचे झालेच वाटोळे समजा.
या आंगातल्या देवांची मजा पहा. मुंबईतल्या डोंगरीहून देव घुमत निघाला चौपाटीकडे. आता देवाची हुशारी पहा. रस्ता मोकळा असेल तर देव मेनरोडच्या अगदी मधोमध नाचत उडत घुमत जातो. जर का समोरून एकादी मोटार टों टों करीत आली का देव झटकन फूटपाथच्या बाजूला धाव घेत जातो. मोटार गेलीसे दिसले का पुन्हा सगळे ते मांड डफडेवाले मंजिरीवाले नि त्या २-३ बाया लागल्या पुन्हा मेनरोडच्या मधोमध येऊन टपांग डांग् चिन् वाजवीत नाचायला घुमायला. अशा ढोंग धतुऱ्याला बाबांनो, तुम्ही काय देव समजता? असल्या देवांची चांगली सटक जाईपावतर झणझणीत पूजा केली पाहिजे काठी खराट्याने. पण आपण पढलो मेण्ढ्यांचे मावसभाऊ!
(आंगात देव आणणाऱ्या बायांची नि त्यांच्या ढोलकी तुणतुणेवाल्यांची हुबेहूब नक्कल करताना गाडगेबाबा इतके विनोदी रंगात येतात की लोकांची हासता हासता मुरकुंडी वळून, शरमेने ते माना खाली घालतात.)
४) आणि तो सत्यनारायण
(सार्वजनिक सत्यनारायणाच्या महापूजेचे व्यसन सगळीकडे फार बोकाळलेले आहे. पुष्कळ वेळा एखाद्या ठिकाणी असल्या सत्यनारायणाच्या महापूजेचा बेत ठरवून, पाठोपाठ गाडगेबाबांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो. ठरल्या वेळी बाबा येतात ते थेट कीर्तनाच्या जागेवर जाऊन उभे राहतात. सत्यनारायणाच्या घाटाकडे ते पहातहि नाहीत. नमस्कारहि करायचे नाहीत आणि तीर्थप्रसादहि घ्यावयाचे नाहीत. मग कशाला करतील ते स्पर्श त्या तुपाळ शिऱ्याच्या प्रसादाला? कीर्तनात हरिनामाचा गजर चालू होऊन प्रवचनाला रंग चढला का ग बाबांचा हल्ला सत्यनारायणावर कसा चढतो ते थोडक्यात पहा-)
"आता हा सत्यनारायण देव लोकांनी तयार केला आहे. चांगला सोयीस्कर देव आहे बरं का हा सव्वा रुपयात हवा तो नवस पूरा पाडतो. सव्वा रुपयात हल्ली मजूर नाही कामाला मिळत. आणि मिळाला तरी चोख काम करील तर हराम. पण हा देव तसा नाही. केला नवस बिनचूक पार पाडतो. मघाशी तुम्ही त्याची पोथी ऐकलीच असंल. त्या कलावति का लीलावतिच्या साधुवाण्याची बोट समुद्रात बुडाली. पार गेली रसातळाला. त्या बाईनं सत्यनारायणाचा प्रसाद खाताच, झट्कन ती बोट आली सुकीठाक ठणठणीत पाण्यावर काय? आहे का नाही या देवाचा चमत्कार? गेल्या दोन महायुद्धात इंग्लंड जर्मनी फ्रान्स अमेरिकेच्या शेकडो मोठमोठ्या बोटी महासागरात बुडाल्या आहेत.
त्या बाहेर काढण्याची ही सत्यनारायणाची सोपी युगत अजून त्याना कोणी सांगितली नाही कशी, कोण जाणे? बंदरावर एक मोठा सत्यनारायण केला, त्याचा प्रसाद सगळ्यांनी खाला का भरभर बुडालेल्या बोटी बाहेर येतील. येतील का नाही, सांगा तुम्ही? ही लांबची विलायतची भानगड राहू द्या. आपल्या जवळच्या मुंबई बंदरातच ती रामदास बोट बुडाली आहे. बापहो, माझी पैज आहे. एक कोट रुपये रोख देतो. कोणीहि सत्यनारायणाच्या भगतानं आपोलो बंदरावर सत्यनारायणाची महापूजा करून, ती बोट वर आणून दाखवावी. असं झालं नाही, तर हासुद्धा, बाबानो, भोळसटाना ठकवून पैसे काढण्याचा एक लबाडीचा धंदा आहे. त्याच्या नादी लागू नका."
५) देवापुढे पैसे फळे ठेवू नका
देवापुढे पैसा अडका फळफळावळ ठेवली म्हणजे आपण मोठे पुण्य केलं अशा समजाचे लोक पुष्कळ आहेत. ही त्याची चूक आहे, बाप्पानो, चूक आहे. भूल आहे. देव मोठा का आपण मोठे? (देव मोठा.) सर्व काही देवाने आपल्याला द्यायचे का आपण देवाला? (देवाने द्यायचे.) देव आपणाला देतो तर मग देवापुढे पैसे का ठेवता? हा देवाचा अपमान आहे. देवापुढे पैसे ठेवणारे लोक मोठे डोकेबाज नि हुशार असतात हां. देवाच्या पाया पडायला जातो नि नमस्कार करून पुढे काय ठेवतो? तर एक भोकाची दिडकी आपल्या खिशात शंभर दहा पाच रुपयांच्या नोटा असलेल्या देवाला काय माहीत नसतात का हो? सगळा अस्सल माल आपला नि रद्दी तेवढी देवाची. हा न्याय कुठला हो बाबांनो? जरा विचार करू या आपण. देव त्या भोकाच्या दिडकीने खुश होईल का? उलट त्या अपमानामुळे आपल्यावर तो रुष्टच होईल. अहो, कसल्या तरी क्षुल्लक चुकीसाठी पोलिसाने आपल्याला पकडले, तर सुटकेसाठी तोसुद्धा भोकाच्या दिडकीने खूष होतो काय? त्याला लागते. हिरवी नोट दिली नाही का बसलाच त्याचा दण्डा आपल्या पाठीवर. हे पहा बाप्पानो, पैशा अडक्यानं नि फळफळावळीनी देवाशी चाललेला आपला हा व्यापार मूर्खपणाचा आहे.
पैसा फळे देवापुढे ठेवून जरा मुकाट्याने खिडकीतून गुपचूप पहा. पैसे लावील पुजारी आपल्या कडोसरीला नि फळावर पडेल त्याच्या मुलांमुलींची धाड. देवाला आपण काय द्यायचे? देव भाव भक्तीशिवाय कशाचाहि भुकेला नाही. "देव भावाचा भुकेला... धरा बळकट भाव, आपोआप भेटे देव." भक्तिभावाचे केलेल्या एका नमस्कारातच देव खूश असतो. राजी असतो. म्हणून सांगतो हात जोडून का बाबानो, देवापुढं पैसा अडका फळाफळावळ ठेवू नका. देवाला नवस करू नका. केले असतील तर देऊ नका. देव कुणाच्या नवसाला आजवर पावला नाही, आज पावत नाही, पुढे पावणार नाही.
देवाला नवस देणारेघेणारे व्यापारी सावकार तुम्ही बनू नका. प्रपंच करून शिवाय वर मोठेपणा मिळावा यासाठी धूर्त लोकांनी तर्कातर्कानी भोळ्या भाविकांना पद्धतशीर जाळ्यात अडकवण्यासाठी ही अनेक देव देवतांची लफडी निर्माण केली आहेत. ती देव दैवते नसून पुजाऱ्यांची अल्प भांडवली दुकाने आहेत. या दुकानांवर देवाणीचा नव्हे तर फक्त घेवाणीचाच सवदा होत असतो. असल्या फंदांचा सर्व संतांनी कडकडीत निषेध केलेला आहे. एकनाथ महाराज म्हणतात-
म्हणती देव मोठे मोठे । पूजताती दगड गोटे ।।
कष्ट नेणती भोगती । वहा दगडाते म्हणती ।।
जीव जीव करुनी वध । दगडा दाविती नैवेद्य ।।
रांढा पोरे मेळ झाला । एक म्हणती देव आला ।।
नाक घासूनी गव्हा । देवा म्हणती गुन्हेगार ।।
एका जनार्दन म्हणे । जन भुलले मूर्खपणे ।।
(६) नवसाने पोरे होतात?
कामंधामं आटपल्यावर संध्याकाळी भोळ्या बाया नि त्यांचे मालक सुद्धा शिळोप्याच्या गप्पा मारायला गावच्या देवळात जमतात. दर्शन घेतल्यावर मालक थोडा वेळ बाहेर थांबतात. हो, कारण ज्ञानोबाराय सांगतात ना की,
देवाचियाद्वारी उभा क्षणभरीं ।
तेणें मुक्ती चारी साधियेल्या ।।
दररोज या चारी मुक्ति साधण्याचा लाभ टाळायचा कसा? मालक गेले का बायांची पार्लमेण्ट भरते. तिथं कसकसल्या भरताड गप्पा निघतील त्याचा नेम नाही. एकादी भागूबाई गंगूबाईला सांगते, “बगा बया, मला पदर आला तवापून चार वरसं झाली, सा वरसं झाली, पुन मुलाचा पत्या नाय. त्या भीमाआजीनं सांगितलं का आपला वंश खंडोबापासनं वाढला. जा त्या देवाकडं नि करा त्याला नवस. फुकाट दीस कशाला घालवता? दुसऱ्याच दिशी कारभारी नि मी खंडोबाकडं गेलू, नवस केला, आन् तवापासनं हा नाऱ्या गंप्या चिंगी नि बनी झाल्या पगा बायानो. देवाच्या दरबारात बसलूया समदी आपन खोटं कशाला बोलायचं? त्ये पहा समूरच कारभारी बसल्याति.
इचारा त्येना हवं तर. खरं का न्हाय वो कारभारी? कारभारी पडला नंदीबैलाचा मावसभाऊ. तो सरळ होकाराची मान हालवतो. आता विचार करा माझ्या मायबापानो, खंडोबापासनं जर पोरं होतात, तर नवरा चांगला, नवरी चांगली, मुहूर्त पहा, कपडे आणा, मांडव घाला, जेवणावळी द्या, बेण्डबाजा लावा, वरात काढा, नवरा बायकोचा जोडा खोलीत घाला, या खटपटी कशाला हो हव्यात? कुण्याहि बाईनं उठावं, देवळात जावं देवाला सांगून चार पोरं आणि दोन पोरी घेऊन यावं. सोपा कारखाना. जमेल का हे? (नाही नाही.) नाही ना? मह नवसानं पोरं झाली नि होतात, असं म्हणणारांची माथी कशी पोकळ आहेत बरं? तुकोबाराय म्हणतात-
नवसें कन्या पुत्र होती । मग कां करणे लागे पति ।
देवांच्या नवसांच्या सबबीवर अशा शेकडो मूर्खपणाच्या गोष्टी आपण करीत असतो. त्या चुका आपण सुधारल्या पाहिजेत बाबानो. तीर्थक्षेत्री जत्रा यात्रा ही सारी भोळ्या भाबड्या लोकांना लुबाडण्याची लफंग्यांनी तयार केलेली भुलभुलय्याची दुकाने आहेत. सापळे आहेत ते. तिथे देव नसतो, देवभक्ति नसते, काही नसते. तीर्थक्षेत्री गेले आणि दाढीमिशा बोडून आले, तरी अडाणीपणा जाणार नाही आणि कर्माच्या कटकटी मिटणार नाहीत. म्हणून बाबानो, सावध व्हा.
(७) जादूटोणे आणि चमत्कार
यावर विश्वास ठेवणारांची विनोदपूर्ण कोटिक्रमानी कीर्तनांत बाबा टर उडवू लागले का हास्याचे खोकाट उडतात. "जादूटोणे करून अथवा मूठ मारून हवा त्याचा धुव्वा माणसाला उडवता येता तर मग तो देवापेक्षाहि मोठा म्हटला पाहिजे. लढायांत असले आठ दहा मूठ मारणारे सोडले का काम भागले. कशाला हव्यात बंदुका तोफा नि ते आटम बांब? मंत्रेंच वैरी मरे । तरी कां बांधावी कट्यारें ।।"
"चमत्कार! अमका माणूस म्हणे एकदम गुप्त झाला. एकाच वेळी चार दूरदूरच्या गावात लोकांना दिसला. असं कधी होतं का बाप्पा. खोटं आहे हे सारं. मुळीच विश्वास टाकू नका असल्या गटारगप्पांवर. देवाला घाम फुटला मारुतीच्या बेम्बीत म्हणे कोणाला टिळक दिसले. का बाबांनो आमच्या टिळकांची नि त्या मारुतीच्या मूर्तीची अशी हकनाहक बदनामी करता?
"सगळ्या पोथ्या पुराणांत हे असले चमत्कार रगड लिहिले आहेत. पण खरं खोटं आपण उमजून घेतलं पाहिजे. उगाच मेण्ढ्यामागे मेण्ढ्यासारखं जाण्यात काय हाशील? "
"माणूस हाच एक मोठा चमत्कार आहे. त्यातल्या त्यात कष्ट मेहनत करून जमिनीतून अन्नाचे सोने काढणारा शेतकरी उपाशी मरतोच कसा? हा एक मला मोठा चमत्कार वाटतो. या चमत्काराचे मूळ शोधायचे, त्यातले खूळ टाकायचे, का अमका गुप्त झाला नि तमका दहा ठिकाणी एकदम दिसला, असल्या चमत्कारांच्या गप्पा मारीत बसायचे? याचा सगळ्यानी विचार केला पाहिजे बाबांनो."
बाबांच्या मागे चमत्कारांचे लिगाड.
जुन्या संत चरित्रकारांनी आणि पोथ्यापुराणानी चमत्कार साक्षात्कार दृष्टांत नि स्वप्नांतल्या प्रेरणांचा लोकमतांवर भलताच परिणाम करून ठेवलेला आहे. स्वतः गाडगेबाबा या फिसाटांचा कडकडीत निषेध दररोजच्या कीर्तनांत अखंड करीत असूनहि, त्याच्याहि मागे चमत्कारांचे नि साक्षात्कारांचे लिगाड लटकवणारे लोक कितीतरी आढळतात. बाबांच्या पायांना हात लावला म्हणजे दारिद्र्य जाते, अशा कंड्या पिकल्यामुळेच, कीर्तन आटोपतांच, बाबांच्या काठीचा तडाखा खाऊनहि पायाला चुटपुटता हात लावण्याची शिताफी साधू पहाणारे भ्रमिष्ट जागोजाग दिसतात. एकदा एका गृहस्थाशी बाबा रेल्वे स्टेशनवर बोलत उभे होते. इतक्यात गाडी आली आणि "याच गाडीने जा तुम्ही" असे बाबा म्हणाल्यावरून तो गृहस्थ तसाच तिकिटाशिवाय गाडीत चढला, मध्यंतरी तिकिट तपासणारे आले. सगळ्यांची तिकिटे तपासली. हा गृहस्थ चुळबुळत घाबरून बसूनच राहिला. त्याचे तिकिट मागितलेच नाहीत. “काय चमत्कार बाबांचा पहा."
आपल्या आठवणीत तो मला लिहितो, "इन्स्पेक्टराने एकदाहि माझ्याकडे पाहिले नाही आणि मी सुखरूप घरी आलो." तिकिट तपासणाऱ्यांचे पुष्कळ वेळा असे दुर्लक्ष होते. नाही असे थोडेच? पण त्या भाविक गृहस्थाला तो बाबानी घडवलेला चमत्कार वाटला आणि तो त्याने मला मुद्दाम लिहून कळवला. अशा गोष्टी बाबांच्या कानांवर गेल्या म्हणजे काय करावे असल्या लोकांना? असे म्हणून कामाला लागतात.
कीर्तन झाले म्हणून गावचा पटकीचा फेरा चुकला. असाहि एक चमत्कार एकाने कळवला आहे. वस्तुस्थिति काय झाली? कीर्तनाच्या गावात बाबा आणि मंडळी गेली. गावभर त्यांना घाण दिसली का आधी ते स्वतः हातात खराटा घेऊन बरोबरच्या मंडळींसह मिटल्या तोंडी गावसफाईच्या कामाला लागतात. या सफाईच्या तडाक्यात गावचे लेण्ड ओहोळहि आरशासारखे स्वच्छ व्हायचे. बाबाच स्वतः त्या घाणसफाईच्या कामाला लागल्यावर गावकरीहि खराटे टोपल्या पावडी नि कुदळी घेऊन धावायचे. जन्मात ज्या गावाची घाण कधी निघायचीच नाही, ती खरचटून साफ झाल्यावर पटकीचा फेरा येतोच कशाला मुळी? स्वच्छतेचे हे साधे तत्त्व लक्षात न घेता, झाला तो बाबांच्या कीर्तनाचा चमत्कार झाला, असे मानणारे भाविक भाबडे लोकच गावोगाव फार. "कसे शहाणे होणार हे अडाणी लोक, कोण जाणे!" इतकेच म्हणून बाबा स्वस्थ बसतात.
(८) हिंसाबंदीचा अट्टहास
मांस मांस सब एकहि है । मुरगा बकरा गाय ।
ऐसा मानव चूतिया । बड़ा प्रेमसे खाय ।।
अपने बेटेका शिर मुंडावे । देख सुरा लग जाय ।
दूसरेकी तो गर्दन काटे । जरा शरम नहि आय ।।
जन्मवरी पोसे लेकूराच्या परी । हाती घेउनी सुरी उभा राहे ।।
असा कसा तुमचा देव । घेतो दुसऱ्याचा जीव ।।
-तुकाराम
तुकाराम या आणि अशाच अनेक संतवचनांचा आधार घेऊन कीर्तनांत हिंसाबंदीचा अट्टहास गाडगेबाबा विलक्षण उमाळ्याने करतात. लहानपणापासून भूतदया हा त्यांचा स्वभावविशेष कीर्तनद्वारा त्यांनी महाराष्ट्रात शेकडो गावी देवांच्या नावानी होणारी कोंबड्या बकऱ्यांची आणि रेड्यांची हत्या कायमची बंद पाडलेली आहे. त्यांच्या अनुयायांनीहि या कामी फार मोठी कामगिरी बजावली. असून एकाद्या ठिकाणी हत्या होत आहे, एवढी बातमीही कळताच खात असलेला घास टाकून, अनुयायांसह बाबा तेथे धाव घेतात आणि दगडालाहि पाझर फुटेल अशा युक्तिवादाने लोकांची मने जिंकून त्यांना त्या खाटकी कर्मापासून परावृत्त करतात.
या हत्याबंदीचा तपशीलवार इतिहास विस्तृत आहे. ठिकठिकाणच्या जीवदया मंडळांनीहि आपल्या चळवळीसाठी बाबांच्या कीर्तन-प्रचाराला अनेक वर्षे वरचेवर निमंत्रणे दिलेली आहेत. हिंसा - विध्वंसनाच्या प्रवचनांत बाबा तल्लीन झाले म्हणजे लोकांना विनोदी चुटक्यांनी रंजवितात, संतवचनानी पापकर्माचा इशारा देतात आणि एकाद्या जिवलग स्नेह्याच्या भूमिकेवरून त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीला अशा खुबीने आळवतात, का कीर्तनातून परततानाच सारे श्रोते हत्याबंदीची शपथ घेऊनच घरोघर जातात.
मठ-पीठाच्या खटपटीचा निषेध
साधकावस्थेत आणि त्यानंतर बाबांच्या प्रचार संचार नि आचाराची मोहिनी अनेकांना लागली. आपणही या वैराग्यशील लोकसेवेला लागावे अशा आशेने बरेच लोक बाबांच्या जवळ आले. त्यांच्या निरिच्छ वैराग्यशील जीवनाची अवधूत गंगा कृतार्थाच्या सागराला मिळण्यासाठी फोफावत जात असताना, वाटेवरची काही झाडेझुडुपे तिच्या पाण्याच्या ओलाव्याने तरारली. विरक्तीचा विवेकी शिडकाव पडलेला कोणी का असामी जवळ येतोसा दिसला का त्याला बाबा हाताशी धरीत. त्याच्या लोकसेवेच्या महत्त्वाकांक्षेला नि विरक्तीच्या ठिणगीला हळुवार फुंकर घालून तो प्रज्वलित करीत. बाबांचे संघटना-चातुर्य असामान्य नजरेला नजर भिडली का माणसाच्या मनाची इमानाची नि कर्तृत्वाची खोली ते चट्कन अंदाजतात.
आजवर त्यांनी अनेक माणसे जवळ केली. त्यांना कार्याची दिशा दाखविली, कीर्तनांचे शिक्षण दिले, आपल्याबरोबर खराट्याचा सेवाधर्म शिस्तवार पाळायला लावला. पण त्या अनुयायांच्या कार्यसिद्धीची अथवा कसोटीची वाट पहात कधीच ते कुठे थांबले नाहीत. ते आपला निश्चित मार्ग एकचित्त आक्रमीतच राहिले. म्हणूनच आज त्यांच्याभोवताली शेकडो विरक्त अनुयायी, निष्ठावान भक्त आणि चाहते श्रीमंत दाते यांचा भरगच्च वेढा पडलेला असताहि, बाबा त्या सर्वांपासून अगदी अलग, भिन्न, दूर अलिप्त आणि अक्षरशः एकटे आहेत. स्वतःलाच डोके टेकायला निवाऱ्याची इंचभर जागा ठेवायची नाही, तेथे मठ पीठ नि मंदिराचा मोह टिकणारच कसा?
वाटेल तिकडे स्वतंत्र संचार करावा, कीर्तनांनी लोकांना हितोपदेश सांगावा, मिळेल ती ओली कोरडी भाकर खावी आणि कोणत्याहि गावी एक दिवसावर चुकूनहि न राहता भ्रमणाची गति अखंड ठेवावी. विसाव्यासाठी सरळ अरण्यवास पत्करावा. हा स्वतःचा बाणा अनुयायांनी चालवला पाहिजे, एवढीच बाबांची अपेक्षा. त्यांच्या मनात कोणाविषयीहि मोह अथवा माया कधीच निर्माण झाली नाही. अगदी त्यांच्या आवडत्या अशा कीर्तनकारांविषयीहि नाही. विरक्तीच्या मार्गावरून ढळतोसा दिसला रे दिसला का दिलाच बाबांनी केळ्याच्या सालपटासारखा दूर भिरकावून! तिथे मग दया नाही, माया नाही नि कोणाची पर्वा नाही. बाबांच्या असामान्य निःस्पृहतेचे मर्म येथेच आढळते.
ना मंत्र ना गुरुपदेश
शिष्यांच्या कानांत मंत्रोपदेश देणे, ठराविक संप्रदायाची माळ गळ्यात घालणें किंवा एकादा विशेष पेहराव वापरायला लावणे, या मामुली संताळी चाळ्यांना गाडगेबाबांनी केव्हाहि थारा दिला नाही नि मुलाजाहि राखला नाही. "ज्यांना लोक-सेवेची ही कष्टाची कामगिरी आवडत असेल, त्यांनी कडकडीत निर्लोभी वृत्तीने ती करावी. परवडली नाही, संसाराचा मोह मनात डोकाऊ लागला रे लागला का झट्दिशी हा मार्ग सोडून खुशाल प्रपंचाला लागावे." हा त्यांचा इशारा वरचेवर ते अनुयायांना देत असतात. आधी प्रपंच करा नि मग परमार्थाला लागा, हे प्रत्येक नवागताला बाबा अट्टाहासाने सांगतात. अविवाहितालासुद्धा "लग्न करूनहि बायकोसकट लोकसेवेच्या मार्गाला लागलास तरी हरकत नाही. पण दांभिक ब्रह्मचर्य नको." असा खडखडीत इशारा देतात. शिष्य म्हणून मिरवणाराना अनुलक्षून प्रत्येक कीर्तनांत ते कटाक्षाने जाहीर सांगत असतात की-
"मला कोणी शिष्य नाही, मी कुणाचा गुरू नाही. स्वयंप्रेरणेने प्रपंचाचा मोह टाकून, जे जे कोणी निरिच्छतेने आणि निर्लोभी वृत्तीने दीनोद्धाराच्या आणि अडाणी जनतेला देवधर्म विषयाचे खरे ज्ञान देऊन त्यांना कर्तबगार बनवण्याच्या कामात तल्लीनतेने झटत झगडत अजून माझ्या मागे टिकून राहिलेले आहेत, ते सारे माझ्या अनंत जन्मांचे गुरूच आहेत." परवा एका गावी कीर्तन करीत असताना आपल्या एका अनुयायाचा बाबांनी `गुरुबंधू` म्हणून उल्लेख करताच, सभोवारचा हज्जारो श्रोतृगण चमकला. शिष्याला बाबा `गुरुबंधू` म्हणतात हे काय गूढ असावे, हाच प्रत्येकाला प्रश्न पडला. खुलासा विचारला असता बाबा हासत हासत म्हणाले, "बाप्पा, तुकारामबुवा आमचे समद्याहीचे (सगळ्यांचे) गुरू. त्याहीचे (त्यांचे) आमी सगयेच (सगळे) शिष्य न हों काय?" या छोट्याशा उत्तरातच बाबांच्या सांप्रदायिक निषेधाचे सारे ब्रह्माण्ड आढळते.
कीर्तनसप्ताह आणि भंडारे.
बाबांचा लोकसंग्रह शतरंगी आहे. त्यांच्या आसपासच्या कार्यकर्त्यांत ब्राह्मणांपासून तो थेट महार मांगापर्यंत सर्व जमातीचे कीर्तनकार भजनी लोकसेवक आणि त्यागी संचारी प्रचारक यांचा सरमिसळ भरणा झालेला आहे. कोण कोठचा नि कोणत्या जातीचा हा भेदच उमगायचा नाही. भेदातीत बंधुभावाचे इतके कौतुकास्पद उदाहरण उभ्या भरतखंडात एकाहि संघटनेत आढळणार नाही.
"कीर्तनाला जा" असा बाबांचा हुकूम सुटला आणि नवशिक्याने "कुठे जाऊ बाबा?” असा सवाल टाकला म्हणजे बाबा सांगतात, "हवा तिथे हवेसारखे जा. पाय नेतील तिकडे जावे, हरिनामाचा गजर करावा, कीर्तन करावे आणि पुढे चालते व्हावे, सारा देश आपल्याला मोकळा आहे."
बाबांच्या कीर्तनाची मोहिनी महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात संचारल्यावर, जागोजाग लोक त्यांना सप्ताहाचा आग्रह करू लागले. "जा त्या गावी, लावा विणा." असा हुकूम सुटला का अनुयायांपैकी कोणीतरी तेथे जाऊन सप्ताहाचा प्रारंभ करायचा. सातव्या दिवशी फक्त कीर्तनाला बाबा हजर. गाडगेबाबांचे कीर्तन होणार ही आवाई गेली का आसपासच्या १०-१० नि १५-१५ कोसावरून स्त्री-पुरुष- मुलांचे घोळकेच्या घोळके पायी, घोड्यांवर नि गाड्यांतून जमा व्हायचे. त्या चिमुकल्या खेड्यात किंवा तालुक्याच्या गावात एकाएकी मोठे लष्कर उतरल्यासारखा गाडीतळ पडायचा. माणसांची तर दाटीवाटीची यात्राच जमायची.
प्रसादाच्या भंडाऱ्याची योजना
बाबांच्या कीर्तनासाठी गावोगावचे हजारो लोक आस्थेने यायचे. मावळतीला परक्या गावी आल्यावर त्यांच्या जेवणाखाण्याची सोय काय? कीर्तन रात्री ९च्या पुढे चालू व्हायचे नि मध्यरात्री १-२ वाजता पुरे व्हायचे. म्हणजे रात्रभर मुक्काम करावाच लागे. सुखवस्तू आपापल्यापुरते फराळाचे आणीत. पण केवळ बाबांच्या रसाळ कीर्तनाच्या रंगात रंगण्यासाठी अन्नपाण्याची पर्वा न करता आलेल्या इतर असंख्य जनांची सोय काय? त्यानी काय उपाशी पोटी कीर्तन ऐकावे?
थोडे तरी फार, तुका म्हणे परोपकार, या तुकोक्तीच्या संदर्भाने बाबानी लोकमताचा कल भंडाऱ्याकडे मोठ्या कुशलतेने वळवून, सप्ताहाच्या दिवशी भंडाऱ्याचा महाप्रसाद करविण्याचा प्रघात सर्वत्र रूढ केला. "गोरगरिबांसाठी थोडेबहुत अन्नदान कराल तर ठीक होईल. आपल्याला दूध द्यायची शक्ति नसेल तर ताक तरी द्यावे. तेहि नसेल तर पोटभर पाणी पाजावे." `आइये बैठीये पीजे थोडा पाणी, यह दो बातोंको नलगे पैसा और आणि.` आपल्याकडे येणाऱ्यांचा प्रेमाने आदर करणे हा मोठा गृहस्थ-धर्म आहे. अशा अर्थाचे बाबांचे उद्गार बाहेर पडताच मग काय हो! सारे गावकरी कंबर कसून भंडाऱ्यासाठी साहित्याची भराभर जमवाजमव करायचे. ज्वारी गव्हाच्या पिठांची पोती, साखरेच्या गोणी, गुळाच्या ढेपी, भराभर थप्प्या लागायच्या. चुली पेटायच्या. पुरुष बायका मुले कामाला लागायची. सैपाक तयार झाला का पुढचा थाट पहा कसा व्हायचा तो.
बाबानी नि अनुयायांनी हातात खराटा घेऊन भोजनासाठी जागा अशी स्वच्छ नि चोख झाडायची का सारे गावकरी आश्चर्याने बघतच रहायचे. ज्वारीच्या पिठाने रांगोळ्या घालायच्या. पत्रावळी मांडायच्या. "बाबा आम्ही आहोत, तुम्ही नुसते पहा", असे कुणी सांगितलेले परवडायचे नाही. कामाचा झपाटा सारखा चालू. पंगतीसुद्धा नीट सरळ ओळीत रांगेने आखायच्या. वेडेवाकडे जड बोजड थातर मातर खपायचे नाही. पंगतीच्या मांडणीचा थाट पाहून शहरी इंजनेरानीहि तोंडात बोट घातले पाहिजे आणि खेडूतानाहि शिस्तीच्या वळणाचा धडा घेता आला पाहिजे, असे धोरण. वेळ झाली का सगळे भोजनार्थी पाहुणे, जात कुळी धर्म स्पृश्य अस्पृश्य कसालाहि भेद न जुमानता, सरळ एकाजवळ एक एका पंगतीत बसून पुण्डलीक वरदा हारि विठ्ठल गर्जनेत जेवायचे. जेवणे आटोपल्यावर खरकटी काढायला, जागा झाडून सारवून स्वच्छ करायला, इतरांच्या बरोबरीने गाडगेबाबा सगळ्यांच्या पुढे हजर.
सहस्रभोजन आटोपताच कीर्तनासाठी रंगणाची व्यवस्थाहि तेच करायचे. इकडे दिवाबत्ती लागत आहे तोंच चट्कन बाबा कोठेतरी निघून जायचे. एवढे प्रचंड मिष्ठान्नांचे भोजन व्हायचे, पण बाबानी आजवर चुकून कधी त्यातला एक घास तोंडात घातलेला नाही. ते जवळपासच्या कोठेतरी एकाद्या झोपडीसमोर हाळी देऊन मिळेल ती भाकर कांदा चटणी मडक्यात खाऊन, बिनचूक वेळेला कीर्तनासाठी समाराधनेच्या जागेवर हजर. मात्र असल्या मिष्ठान्न समाराधनेतच जर कोणी भाकर भाजी झुणका आमटी आणून त्यांच्या मडक्यात दिली तर पंगतीत दाटीवाटीने बसून आनंदाने खातील. मिष्ठान्न अपंग गोरगरिबांना. आपण स्वतः इतराना भरपूर वाढायला सांगतील. त्याचे खरकटे काढतील. पण एक घास चुकूनहि कधी चाखणार नाहीत. हा निर्धार आजपर्यंत अखंड पाळलेला आहे. या समाराधनेत अनाथ अपंगाना कपडे वाटण्याचेहि कार्यक्रम नेहमी होत असतात.
अंध पंगू कुष्टांना मिष्टान्न-भोजने
आत्यंतिक निरिच्छता हा गाडगेबाबांचा चरित्र्याचा आत्मा. त्याच्यापुढे मोठमोठ्या धनवंतांनी हात टेकले नि उदारधींच्या उदारतेने मान वाकवली. चिंध्या मडके धारी ही त्यागी विभूति कण्ठशोष करून जनतेला नवा माणुसकीचा धर्म शिकवते, दररोज पाच पंचवीस मैलांची पायपिटी करीत गावेच्या गावे नि शहरेच्या शहरे पायदळी घालते. कोणी काही मिष्ठान्न पक्वान्न कपडालत्ता दिला तर त्याचाहि अव्हेर करून निघून जाते, अडल्या नाडल्याच्या अडवणुकीत सोडवणुकीला धावते, कसे या साधुपुरुषाचे पांग फेडावे? या प्रश्नाने गावोगावचे लोक विव्हळ व्हायचे. “बाबा, तुमच्यासाठी आम्ही काय करावे सांगा?" माझ्यासाठी? मला कशाचीच काही गरज नाही. काही करायचेच असेल तर तुमच्यासाठी तुम्ही करा, मी सांगतो. अन्नदानासारखा जगात दुसरा मोठा धर्म नाही. तुम्ही भाग्यवंत लोक नेहमी आणि सणासुदीला गोडधोड करून खाता. बाबानों, जरा सभोवार नजर टाका. शेकडो हजारो लाखो आंधळे पांगळे लुले लंगडे महारोगी गावोगाव मुंग्यांच्या वारुळसारखे वळवळताहेत. उष्ट्यामाष्ट्यावर कशी तरी पोटाची खाच भरताहेत. तुमच्या कमायतीत नाही काहो बाबानो, त्यांचा काही हक्क? त्या आपल्या अभागी भावाबहिणींना सन्मानाने पाचारून वर्षातून एकदा तरी, एकाद्या यात्रेजत्रेच्या प्रसंगी, गोडधोडाचे पोटभर जेवण घालण्याची वहिवाट ठेवाल तर देवाला तोच खरा निवेद. तीच त्याची खरी भक्ति नि तीच खरी त्याची महापूजा."
सप्ताहाच्या भंडाऱ्याप्रमाणेच अनेक वेळा केवळ अनाथ अपंगांसाठी मिष्टान्नांची भोजने आणि त्यांना वस्त्रदान, हे समारंभ महाराष्ट्रात हजारो ठिकाणी आजवर साजरे केले आहेत आणि सध्याहि होत आहेत.
झंझावाती संचाराची फलश्रुती
गाडगेबाबांचा संचार म्हणजे एक तुफानी झंजावाताचा सोसाटा म्हटले तरी चालेल. कोणत्याहि ठिकाणी एक दिवसापेक्षा अधिक ते कधी रहायचेच नाहीत. आज मुंबईला दिसले तर उद्या वऱ्हाडात वर्ध्याला परवा औरंगाबादला नि तेरवा थेट गोव्याच्या सरहद्दीवरील एकाद्या गावी. त्यांची गाठभेट बिनचूक घेणे आजवर त्यांच्या निकटवर्ति अनुयायांनाहि साधत नाही. तेथे इतरांचा पाड काय? या झंजावाती संचारात त्यानी वऱ्हाड ते गोमांतकापर्यन्त लोकांच्या रहाणीचे फार सूक्ष्म निरीक्षण केलेले आहे. यात्रा जत्रांच्या तीर्थक्षेत्रांत गोरगरिबांच्या अन्नपाणी निवाऱ्याचे किती भयंकर घाल होतात, ते त्यांनी पाहिले होते. ही अडचण दूर करण्याचा त्यानी निश्चय केला आणि जागेजाग धर्मशाळा सदावर्ते पाणपोया आणि मागासलेल्या जनतेच्या उमलत्या पिढीसाठी शाळा नि बोर्डिंगे स्थापन करण्याची अनन्यसामान्य कामगिरी केलेली आहे.
सन १९०८ साली ऋणमोचनच्या नदीला घाट, परीट जमातीची धर्मशाळा- गावकऱ्यांच्या इच्छेसाठी लक्ष्मीनारायण मंदिर वगैरे कामे गाडगेबाबांनी लोकांकडून करवून घेतल्याचे मागे सांगितलेच आहे. त्यानंतर सालोसालच्या वार्षिक मुद्गलेश्वराच्या पौषी यात्रेला बाबा गेले का एकेका नवीन कार्याचा पाया घालीत आणि भटकंतीला जात. ऋणमोचनाला आता एकचसा काय, पण सोयीस्कर जागी नदीला चार प्रचंड घाट बांधण्यात आले आहेत व पांचव्या घाटासाठी जनतेची ५ हजारांची वर्गणी तयार आहे.
बाबांचे ते फुटक्या गाडग्याचे टवकळ जशी त्यांची कामधेनू, तशी आत्यंतिक निरिच्छतेने आणि कमाल निःस्पृहतेने झळकणारी त्यांची वाणी जागोजागी कल्पवृक्षाप्रमाणे मोठमोठ्या धर्मशाळा अन्नसत्रे गोरक्षण संस्था आणि शिक्षणाच्या शाळा जादूप्रमाणे निर्माण करीत चालली आहे. तोंडातून शब्द निघायची थातड, मोठमोठे श्रीमंत स्त्रीपुरुष तो झेलायला आजूबाजूला हात जोडून उभेच असतात. गाडगेबाबांनी केवळ इच्छामात्रे करून महाराष्ट्रभर उभारलेल्या असल्या लोकोपयोगी इमारतींचे नि संस्थांचे जाळे फार विशाल आहे. त्यांची तपशीलवार माहिती आणि देणगीदारांची यादी एका १०० पानी सचित्र ग्रंथातच छापलेली मिळते. वानगीदाखल काही ठळक संस्थांची नावे मात्र येथे देणे शक्य आहे.
(१) ऋणमोचन घाट. मंदिर, सन १९०८. खर्च रु २५ हजार. आणखी ३ घाटांचा हिशोब निराळाच.
(२) मूर्तिजापूर गोरक्षण संस्था, धर्मशाळा, सन १९०८, खर्च १ लाख रुपये.
(३) पंढरपूर चोखामेळा धर्मशाळा, बोर्डिंग, सन १९२०, खर्च १ लाख रुपये.
(४) पंढरपूर मराठा धर्मशाळा, सन १९२०, खर्च २ लाख.
(५) पंढरपूर परीट धर्मशाळा, सन १९२५, खर्च २५ हजार
(६) नाशिक धर्मशाळा, सन १९३०, खर्च ३ लाख.
(७) आळंदी धर्मशाळा, सन १९३०, खर्च १ लाख
(८) आळंदी परीट धर्मशाळा, सन १९३०, खर्च १० हजार.
(९) देहू धर्मशाळा, सन १९३०, खर्च २५ हजार
(१०) त्र्यंबकेश्वर कलईवाला धर्मशाळा, सन १९४८, खर्च २५ हजार.
(११) पुणे आकुल धर्मशाळा, सन १९४०, खर्च दीड लाख.
(१२) त्र्यंबकेश्वर परीट धर्मशाळा, सन १९४०, खर्च १० हजार.
याशिवाय आणखी पाच पन्नास संस्था आहेत, त्यांची नावनिशीवार यादी कोठवर द्यावी? पंढरपूरची हरिजन धर्मशाळा पुढे चालण्यासाठी नुकतीच डॉ. आंबेडकर यांच्या स्वाधीन करण्यात आली.
विचार करण्यासारखा मुद्दा
या संस्थांच्या टोलेजंग इमारती बाबांनी मनोमन आखाव्या, स्वयंस्फूर्त धनिकानी `घ्या घ्या` म्हणून पैशांच्या राशी बाबांपुढे ओतून त्या प्रत्यक्षात आणाव्या आणि पायाभरणीच्या क्षणालाच त्या सर्व इमारतींचे ट्रस्ट डीड करून त्या जबाबदार, विश्वस्तांच्या हवाली कारभारासाठी द्याव्या. प्रत्येक ठिकाणी त्यात एक मुख्य अट ठळकपणे प्रथमच असायची. ती ही- "या संस्थेत खुद्द गाडगेबाबा, त्यांचे वारस वंशीय नातेगोतेवाले यांचा सुतळीच्या तोड्यावरही कसला काही हक्क नाही. कोणी तसा कधी सांगू लागल्यास त्याला हुसकावून द्यावे. सदावर्तातहि त्यांना अन्न घेण्याचा अथवा येथे वसति करण्याचा हक्क नाही." या कठोर निरिच्छतेला नि कमाला निःस्पृहतेला हिंदुस्थानच्याच काय, पण जगाच्या इतिहासातहि जोड सापडणार नाही.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा. बाबांनी कोठेहि एकादे देऊळ बांधलेले नाही किंवा स्वतःसाठी मठ उभारलेला नाही. तीर्थाच्या ठिकाणी देवांची मोठमोठी ख्यातनाम देवळे आहेत. पण तेथल्या त्या दगडी देवाचे दर्शनहि बाबा कधी घेत नाहीत, आजवर घेतलेले नाही. देव देवळांत असतो, ही कल्पनाच त्यांनी कधा मानलेली नाही आणि इतरांनीहि ती मानू नये, असा त्यांचा वाजवी अट्टहास असतो.
मात्र कोठे एकादे देऊळ असल्यास त्याचा अनादर ते करायचे नाहीत. नाशिकच्या ओसाड टेकडीवर धर्मशाळा बांधताना मध्येच एक मारुतीचे लहानसे देऊळ आढळले. बाबांनी ते नीट मोठे बांधून घेतले. एका मजल्यावर मारुतीची बैठक आणि देवळाचा घुमट वरच्या मजल्यावर, अशी ती धर्मशाळेच्या इमारतीच्या पोटातच केलेली युक्तिबाज बांधणी प्रेक्षकाला आचंब्यात पाडते.
निर्वासित मारुतीचा उद्धार
याच टेकडीवर ९ फूट लांब, ३ फूट रुंद नि दीड फूट जाडीची एक दुसरी मारुतीची मूर्ति टेकडीत गाडलेली बाहेर निघाली. बाबांनी बरेच दिवस ती एका बाजूला काढून ठेवली. "असू द्या मारुतीराय सध्या इथेच. लावीन त्यांची सोय कुठेतरी." काही वर्षांनी बाबा वऱ्हाडात गेले असताना मूर्तिजापूर धर्मशाळेत येणाऱ्या लोकांनी सांगितले. “बाबा मूर्तिजापूर शहर मोठे. तेथे पुष्कळ देवळे आहेत. पण या धर्मशाळेत देव नाही, देऊळ नाही. म्हणून येथे लग्न लावलेल्या नवरा-नवरीला दर्शनासाठी लांब दूरच्या देवळात जावे लागते." देव देवळांबद्दल बाबांचा अभिप्राय काहीहि असला तरी या किंवा दुसऱ्या कोणत्याही बाबतीत अडाणी जनतेचा बुद्धिभेद ते करीत नाहीत. ते मुलांच्या बोलीने बोलतात नि चालीने चालतात. त्यांनी नाशिकला तार दिली की “बाजूला काढून ठेवलेला तो मारुती ताबडतोब पहिल्या गाडीने घेऊन यावे."
ती प्रचंड जाडजूड मारुतीची मूर्ति नि आगगाडीने न्यायची तरी कशी? कारभारी नि शिष्य विचारात पडले. अखेर सहा बैलांच्या खटाऱ्यांतून मारुतीरायाना स्टेशनवर आणले. गाडगेबाबांचे नाव ऐकताच रेलवेचे सारे अधिकारी नि हमाल धावले. त्यांनी मूर्ति मेलगाडीत चढवली. स्टेशनला तार दिली का गाडगेबाबांचा मारुती मेलने येत आहे, उतरून घ्या. मूर्ति उतरून घ्यायला शेकडो लोक आधीच तयार उभे होते. बाबांनी धर्मशाळेनजिक योग्य जागेवर मारुतीची स्थापना केली आणि गावकऱ्यांना सांगितले, "देव पाहिजे होता ना? हा घ्या देव. आता मात्र त्याच्यासारखे शूर आणि पराक्रमी बनले पाहिजे तुम्ही सगळ्यांनी." नाशिकच्या उकीरड्यातल्या मारुतीचा अखेर वऱ्हाडात निर्वासितोद्धार झाला.
कशाला हा एवढा भुईला भार?
देवळे नि त्यातले देव याविषयी बाबांच्या मताची मूर्खानंदजी एक मजेदार आठवण सांगतात. गाव नेमके आठवत नाही. पण त्या गावी नदीकाठी खूप देवळे होती. बहुतेक सारी शिवालये. त्या गावी कोणीतरी केलेल्या सप्ताहाचे शेवटी बाबांचे कीर्तन झाले. दुसरे दिवशी सकाळी बाबा म्हणाले, “रात्री कीर्तनाला जेवढे लोक होते, तितकीच देवळे आहेत इथं." आम्ही या अतिशयोक्तीबद्दल हासलो.
“हासता कशाला बाप्पा? तुम्हीच पहा ना. सगळी नदीची दरड या देवळानीच भरली आहे. पण व्यवस्था पाहिलीत का त्यांची? कोण्या देवळात नंदी नाही तर कोण्या ठिकाणी देवाचाच पत्ता नाही. मग तो लेक काय फिरायला गेला म्हणावं? कशासाठी बांधली असतील एवढी देवळं?"
“धर्मश्रद्धा, बाबा." मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
“संस्किरत (संस्कृत) भाषेत नको काही सांगू. असं सांगा का भोळा भाव. पण या देवळांची ही अशी परवड होईल असं स्वप्न त्याना पडल असतं तर? तो पहा, तो पहा, एक कुत्रा बेधडक देवावर लघवी करून चालला."
कुत्र्याला मारण्यासाठी मी दगड उचलला. मला अडवून बाबा म्हणाले, "कोणाला मारता? कुत्र्याला? कां बाप्पा? तुम्हाला रागच आला असेल, तर तो ही देवळं बांधणारांचा आला पाहिजे. कशाला इतकी देवळं बांधली? एकच बांधायचे होतं नि त्यातल्या देवाला म्हणायचं होतं रहा बाप्पा इथं येऊन. भुईल भार करून ठेवला उगीच. तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ।। असंच म्हणतात ना आपलं तुकोबाराय?"
पहाल तेथे शिस्त, कदर नि दरारा
आजवर जवळजवळ १४ लाख रुपयांच्या इमारती नि संस्था बाबांनी जागोजाग निर्माण केल्या, पण स्वतः किंवा त्यांची वृद्ध पत्नी सौ. कुंताबाई चुकून कधी या इमारतींच्या छायेत विसावा घ्यायला क्षणभर बसलेल्या आढळणार नाहीत. त्यांचे वसतिस्थान दूर कोठेतरी ओसाड जागेतल्या चंद्रमौळी झोपडीत अथवा चक्क एकाद्या झाडाखाली. अन्नसत्रात रोज कितीतरी अनाथ अपंग भाकरी आमटी खातात, पण तेथेहि त्याना कदरबाज मज्जाव. खुद्द बाबा जरी जेवणाच्या वेळी हजर असले तरी सगळ्यांच्या बरोबरीने खरकटी काढण्याचे आणि जागा स्वच्छ करण्याचे काम करतील, पण तेथला भाकरीचा चतकोर कधी तोंडात घालायचे नाहीत.
प्रत्येक भेटीला धर्मशाळेची पहाणी चौकशी अगत्य करतील. कोठे काही घाण दिसली का घेतलाच खराटा आणि झालीच सुरू साफसफाई. एकूणेक संस्थेवर बाबांची टेहळणी कडक कदरबाज. वेडेवाकडे गदळ गबाळे गचाळ घाणेरडे तिळमात्र खपायचे नाही त्यांना तेथल्या कारभारात. लोकांच्या सुखसोयीकडे आणि व्यवहारात, जिकडे नजर टाकाल तिकडे, लष्करी शिस्त आणि कदर नांदताना दिसते.
बांधकामातील सौंदर्यदृष्टी
गाडगेबाबांनी उभारलेल्या कोणत्याहि धर्मशाळेचे किंवा घाटाचे बांधकाम पहा, तेथे सर्वत्र त्यांची उपजत सौंदयदृष्टी ठळकपणे दिसून येईल. इमारतीसाठी जागा पसंत करण्यापासून, पाया खोदणे, भरणे आणि बांधकाम चढवीत जाण्यापर्यंत सगळे प्लॅनिंग एस्टिमेटिंग बाबांच्या खास देखरेखीखाली पार पडायचे. ते प्लॅनिंगसुद्धा कागदावर नसून, बाबांच्या डोक्यात! गवंडी पाथरवट लोहार सुतार याना हरएक लहानमोठी बाब त्यांनी तोंडी समजावून सांगायची आणि कल्पनेप्रमाणे करवून घ्यायची, हा खाक्या, इंजिनीयर कोठेहि लागायचा नाही. वाचकानी मुद्दाम एकदा एकादी इमारत पहाण्याची तसदी घ्यावी. सगळीकडे अद्ययावत सुखसोयीचा माल वापरलेला. दारे खिडक्या गज पायऱ्या कठडे खोल्या गॅलेऱ्या तुळशी-वृंदावने बागबगिचे विहिरी विसाव्याचे हवेशीर कट्टे, काय वाटेल ते पहा, सर्व काही अपटूडेट साहित्याने बनवलेले आढळेल.
नाशिकच्या धर्मशाळेची पूर्वीची ती ओसाड भयाण नि मुनसिपालटीच्या संडासी गाड्यांनी आणि मेलेली ढोरे टाकल्यामुळे गिधडांनी गजबजलेली टेकडी असेल, तेथे आज गाडगेबाबानी आपल्या पाच मजली झकास धर्मशाळेने निर्माण केलेले नंदनवन नवलाने नि आश्चर्याने थक्क करीत आहे. प्रत्येक मजल्यावर चौक नि झाडांचे कट्टे पाहून प्रेक्षक बुचकळ्यातच पडतो. तेथली स्वच्छता नि व्यवस्था मुंबईसारख्या शहरातील मोठमोठ्या राजेलोकांच्या निवासातहि आढळणार नाही.
एका निरक्षर चिंध्याधारी माणसाने जागोजाग उभारलेली ही लोकोपयोगी निवासाची रम्य स्थाने आणि त्यांच्यासाठी “घ्या बाबा घ्या" म्हणून अनेकांनी ओतलेला लाखो रुपयांचा धनसंचय, ही घटना या विसाव्या शतकाला महाराष्ट्रातला एक मोठा लोकोत्तर चमत्कारच होय.
****
प्रकरण ४ थे
शून्यातून निर्माण केलेला पसारा
बाबा मजुरीत मजूर
लाखो किंमतीच्या धर्मशाळा उभारायच्या म्हणजे मजूरादि कष्टकरी मंडळींच्या पलटणीच तेथे रोज खपायच्या. गाडगेबाबा तर त्या विश्वाचे प्रत्यक्ष विश्वकर्म म्हणून काय ते स्वतः, त्यांचे पाच पन्नास शागीर्द, त्यांचे कुटुंब कन्या जावई, जे कोणी त्या वेळी जवळ असतील ते, बाजूला पेटीत उभे राहून चाललेले काम पहात बसतील होय? छे छे! मजुरांच्या बरोबरीने त्यांनाहि खराटा खोरे टोपल्या पावडी हातांत घेऊन बाकीच्या मजुरांबरोबर काम करावे लागेच लागे. स्वतः खुद बाबांनीच हातात कुदळ टोपले घेतल्यावर त्यांची काय शहामत लागलीय स्वस्थ बसण्याची? सरळ रेषेत खोदकाम करीत जाणारी बाबांची कुदळ पाहून मजुरांनाहि शिस्तीचे आणि कुशलतेचे शिक्षण मिटल्या तोंडी मिळायचे.
कोणाचे कुठे जरा चुकले, सरळ रेषेत बांक दिसला का “अहो बाप्पा, जरा नजर टाका, लाईन बिघडली." अशी जोरदार आरोळी आलीच. कोणतेहि काम असो, ते कुशलतेने चोख कसे करावे याचे धडे पाथरवट गवंडी सुतार लोहारानी बाबांकडून पदोपदी घेतल्यामुळे, “बाबांच्यापुढे आपले काही चालणार नाही हो" अशा खात्रीने प्रत्येक कामगार आपापली कामे चोख करी. या मुद्याविषयी एक वेळचे निकटवर्ति अनुयायी श्री. मूर्खानन्द यांची एक आठवण वाचकांना अधिक खुलासा करील -
"निःस्पृहपणाच्या बाबतीत बाबांना उपमा तुकारामबुवांची! स्वतःच्या मुलीची आणि पत्नीचीही भीड त्यांच्याजवळ नाही. आम्ही पंढरपूर आणि नाशिकच्या धर्मशाळांचे बांधणीचे काम चालले, तेंव्हा त्यात हजर असूं. कष्टकरी मंडळींचा एक ताफाच बाबांच्या संग्रही असे. कुठेही कसले काम सुरू झालं, की ही सगळी मंडळी तिथे जाऊन हजर व्हायची. मूर्तिजापूरजवळील मला वाटतें शिरसोली गांवचे देशमुख श्री. अवचितराव, हे आम्हां सर्वांवरचे मुकादम. मोतीरावबुवा मांग, हे या कष्टकरी पलटणींतले एक शिलेदार. बाकी नांवे स्मरणांतून गेली आहेत. पण बाबांच्या खात्यांत असलेल्या प्रत्येकासच टिकाव, खोरें, पाटी या शास्त्राची दीक्षा मिळालेली असायची. खराटा हें या खात्याचे अत्यंत आवडतें शस्त्र.’’
"या कष्टकऱ्यांतच बाबांची कन्या सौ. अलोकाबाई व जावई श्री. फकीराजी यांचा समावेश झालेला. सगळ्यांशी सारखी वागणूक, एकाला उणें आणि दुसऱ्याला दुणें हा भेदभाव बाबांजवळ नाही. काम आटोपल्यावर आम्ही सगळीं माणसें एका पंक्तींत जेवायला बसायचो. मुकादमाच्या मांडीला मांडी भिडवून साधा झाडूवाला. यामुळें कोणालाही काम जाचायचें नाही.’’
“बाबांच्या पत्नी सौ. कुंताबाई यांना आम्ही सगळे आई म्हणत असूं. बाई आपली साधीसुधी. बाबांची निःस्पृहता आणि निर्लोभी महत्ता बाईंत उतरायलाच हवी, असा आग्रह धरण्यांतही काही अर्थ नाही. आईंना वाटायचें एवढें हें एका लहानशा संस्थानासारखं खातें चाललेलें, केवळ माझ्या पतीचे, अर्थात माझाही यावर तेवढाच अधिकार. पण बाबा कसले! बाबांची निर्मोही वृत्ति पाहून मला कधीकधी हिमालयाच्या शिखरांची आठवण होई. गौरीशंकर हे ठिकाण आम्हाला वंद्य हे मान्य. पण त्यावर कुणालाच रिघाव नाही! सगळ्यांनी दुरूनच त्याविषयीं आश्चर्य मानून घ्यावे. त्याला नमस्कार करावा. तसें बाबांचें. त्यांनी कोणाही माणसाला त्यांच्या `अस्मिते`जवळ फिरकूं दिलें नाही. ते आमच्यांत असून, आम्हावेगळे. स्वतःच्या पत्नींच्या बाबतींतही त्यांनी या नियमाचा भंग होऊ दिलेला नाही.’’
माया-मोहाचा खरचटून निचरा
निस्संग बेपर्वाईच्या बाबतीतहि बाबा आप पर भेद मानीत नाहीत. याची काही उदाहरणे देतो. वेळी इतरांच्या दुःखाने कळवळून धावतील, पण स्वकीयांबद्दल तोहि कळवळा त्यांच्यापाशी नाही.
(१) साधकावस्थेत असताना, मातोश्री सखुबाई नि पत्नी सौ. कुंताबाई पर्णकुटी चंद्रमौळी झोपडीत राहू लागल्यानंतर, कु. कलावती (बाबांची २री कन्या) हिचे लग्न जमले. बाबाना हे कळवायचे तर त्यांचा पत्ता ब्रह्मांडात कोठेहि? घरात सगळाच खडखडाट आणि लग्नाची तीथ आली परवावर. व्याही जातगोतवाल्याना निदान झुणका भाकरीचे जेवण तरी घालू, एवढ्यासाठी सखुबाईने खूप आटापिटी केली. पण काही जमले नाही. वऱ्हाड जमले. कसेबसे लग्न लागले. पहातात तो वधूगृही थंड पाण्याचा फराळ! तडफडत निघाले सगळे परत. वाटेत डेबूजींची स्वारी भेटली, कोण मंडळी, कुठं निघालात, वगैरे चौकशी केली.
“अहो, आम्ही इकडे लग्नाला आलो होतो. पण लगीनघरी ना ज्वारीचा दाणा ना बैलाना कडबा. सगळा थंडा मामला. चाललो परत भुकेल्या पोटी." डेबूजीने त्याना परतवले. तसाच तो एका आपला भक्त असलेल्या व्यापाऱ्याकडे गेला. झुणका भाकरीचे सामान आणून जेवण घातले सगळ्यांना. वऱ्हाड्यांना आता आहेर करणेच प्राप्त. “कपडालत्ता देऊ नका. द्यायचेच असेल काही तर रोख रक्कम आहेरात टाका." असे डेबूजीने सुचवले. सखुबाई कुंताबाईच्या तोंडाला पाणी सुटले. त्या रोख आहेराच्या रक्मेने बाबांनी कडबा विकत घेतला आणि गावातल्या सगळ्या ढोराना पोटभर चारला. झाला लग्नाचा थाट! आहेराच्या रक्कमांचा बळावर जातील थोडे दिवस सुखाचे, ही आईची आशा हवेतल्या हवेत विराली!
(२) कीर्ति नि लोकमान्यतेच्या सिंहासनावर बाबा आरूढ झाल्यावर मातोश्री सखुबाई एका खेड्यात आजारी पडली. शेवटचेच दुखणे होते ते! बाबांना गाठून ही बातमी कळवायची शिष्यांनी खूप पायपीटी केली. कोणत्याहि गावी घड एक दिवस रहातील तर भेट आणि तीहि फक्त अगदी कीर्तनाच्या ऐन क्षणाला. त्या वेळी कोणी इतर बाबतीत त्यांच्याशी बोलूच शकणार नाही. अखेर, एका मुक्कामावर बातमी दिली आणि आईने भेटीचा धोसरा घेतला आहे, असे कळवले. "आई आजारी, तर एकाद्या चांगल्या डाक्टराला बोलवा. मी येऊन मला काय त्यात समजणार?` असा जबाब देऊन स्वारी लागली गोविंद राधे करीत कीर्तनरंगी नाचा डुलायला.
आईच्या मृत्यूची बातमीसुद्धा मृत्यूनंतर सहा महिन्यांनी त्यांना कळली. कलावती मुलगी लग्नानंतर ५-६ वर्षांनी वारली. ती हकिकत २ वर्षांनी समजली.
(३) आपल्या गोविंद नातवाचे लग्न आपल्या डोळ्यांसमोर व्हावे असे सखुबाईने ठरवून मुंबई वरळी येथे लग्नाचा बेत केला. बाबांचे शेकडो भक्त हवे ते साहित्य घेऊन उभे राहिले. थाटाचा मंडप घातला. जेवणावळीचे वरातीचे मोठमोठे बेत ठरले. मोटारी सजू लागल्या. बाबांचा फेरा आला. सगळे श्रीमंती बातबेत रद्द ठरवले. वधू-वराला थंड पाण्याची आंघोळ घातली. लग्न लागल्यावर झुणका भाकर मडक्यातून वाढली. वरातीसाठी बैलांचा खटारा मुक्रर झाला. आणलेले सगळे आहेर परत घ्यायला लावले. खलास! झाला लग्नाचा थाट! या प्रसंगाने बाबांच्या निर्मोही आणि निरिच्छ वृत्तीचा पडताळा मुंबईकर श्रीमंत भक्तांना खराखुरा पटला.
(४) जन्मापासूनच गोविंदाचे फार हाल झालेले. बाबा तर संसाराकडे ढुंकूनहि पहायचे नाहीत. गोविंदा ९-१० वर्षांचा झाला. तेव्हा काही भक्तांनी शिक्षणासाठी त्याला मुंबई पुणे किंवा पंढरपूर येथे ठेवण्याची योजना केली. जेवण राहण्याची उत्तम सोय करणारेहि पुढे आले. पण ते काही नाही. `त्याने कुठेहि राहायचे असेल तर मधुकरी मागून विद्या शिकावी` हा बाबांचा हट्ट. श्री शिवाजी मराठा फ्री बोर्डिंगात पुण्याला मराठी ४थी इयत्तेत शिकत असताना गोविंदाला कुत्रे चावले. वेळेवर उपाय न झाल्यामुळे, ता. ५ मे सन १९२३ रोजी तो मरण पावला.
त्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण गावी बाबांचे कीर्तन होते. तेथे तार पाठवली. बाबा कीर्तनासाठी येऊन दाखल झाले. तार हातात घेऊन एक गृहस्थ जवळ आले, तोंच बाबा त्याला म्हणाले,
"बाप्पा, फार भूक लागली आहे. भाकरबिकर आणली का नाही?" पण
त्याच्या तोंडून शब्दच फुटे ना. तो ढसढसा रडायलाच लागला. "झाले तरी काय? सांग बाप्पा सांग." असे बाबांनी विचारताच, त्याने गोविंदाच्या मृत्यूची बातमी सांगितली. निर्विकार मुद्रेने बाबा उद्गारले "मेले ऐसे कोट्यानुकोटी, काय रडूं एकासाठी?" झाले. एकदम कीर्तनाला उभे राहिले आणि हरिनाम कल्होळात स्वतः रंगले आणि हजारो श्रोत्यानाहि रंगवले.
बाबांचे परात्पर गुरू संत तुकाराम
देश काल वर्तमान अभ्यासून गाडगेबाबांनी मानव-धर्माची जी एक नवीनच घडण घडली, त्यातल्या अनेक तत्त्वांचा पुरस्कार ते श्रीसंत तुकाराम महाराजांच्या अभंगांनीच मुख्यत्वे करीत असतात. मधूनमधून कबीर एकनाथ चोखामेळा जनाबाई नामदेव यांच्या दोहरे- कवनांबरोबरच श्रीज्ञानेश्वरीतील ओव्यांचाहि ते कीर्तनात समयोचित पुरावा देतात. श्रीगणेशाचा चुकूनहि गंध न लागलेला हा गृहस्थ तुकारामादि संतवचनांची भराभर मांडणी करण्याइतका पंडिती पटुत्वाचा ॐ नमः सिद्धम् कसा करु शकतो, हे खरोखरच नवल वाटते. या नाक्षराने संतांच्या गाथा वाचल्या तरी कशा असतील? आणि वाचल्या नसतील तर हे एवढे प्रचंड पाठांतर तरी असेल कसे?
स्वतःच्या चरित्राविषयी कसल्याहि तपशिलाची बाबा सहसा दाद लागू देत नाहीत. कोणी काही विचारले तर "मला काय माहीत?" किंवा "नाही मला आता आठवत." या उत्तरानी विचारणाराला धुडकावून लावतात. म्हणूनच या संबंध चरित्रात तारीख वार महिना सनाचा पत्ता कोठेहि आढळणार नाही. पण या पाठांतराविषयी स्वारीची लागली एकदा लहर आणि सांगितली खालची गोष्ट.
(बारा वर्षांच्या साधकावस्थेनंतर) "माझ्या भटकंतीत मला एक परीटबुवा भेटला. नावगाव आता आठवत नाही. तो चांगला शिकला सवरलेला होता. मोठा कर्मकांडी, स्नान जपतप पोथी पुराणे वाचणे याचे मोठे बण्ड. सारखा तो त्यातच गुरफटलेला असायचा. टिळे माळा भस्म रुद्राक्ष आंगावर भरपूर. तुकोबारायाचे अभंग रोज तो मला वाचून समजावून सांगायचा. `समजले नाही` अशा मुद्रेने मी मुकाट बसलो, का तो अभंग पुन्हा पुन्हा जोराजोराने सुरावर वाचायचा. मला तो पाठ व्हायचा. लगेच त्या रात्रीच्या कीर्तनात मी तो सांगायचा. तसे म्हटले तर अभंग दोहरे मला फार थोडेच यायचे. पण कोण जाणे कसे व्हायचे ते, हव्या त्या जिव्हाळ्याच्या मुद्यावर बोलणे (प्रवचन) मला भरपूर करता यायचे. लोकांना तेच फार आवडायचे आणि मग ते ओरडायचे "बुवाजी, अभंग दोहरे नको, काही तरी सांगा."
अजागळानी ज्योतिष्याच्या नादी लागावे
याच परीटबुवाविषयी बाबा आणखी सांगतात, "पण या परीटबुवाला एक मोठी वाईट खोड होती. उठल्यासुटल्या तो पंचांग पहायचा. कुठे जायचे, काही करायचे, कुणाला भेटायचे का काढलेच याने आपले पंचाग बाहेर नि बसला ग्रहमानावर बोटे चालवीत. ग्रहमान अनुकूल नाही, असे पंचागात दिसले का हा जागचा उठायचा नाही. मी म्हणायचा, "अहो बाप्पा, तुकोबारायानी या पंचांगाची नि मुहूर्ताची टर उडवल्याचे अभंग तुम्ही मला तोंडपाठ दाखवता, घोळून घोळून अर्थ सांगता, मग तुम्हीच कसे या वेडगळ फंदात पडता?" पटायचे नाही ते त्याला. काळीज खुंटीवर अडकवून फक्त डोक्यानी कामे करणारे पंडित मंडळी असतात ना, त्यातलाच तो एक होता. खूपखूप वाचले, पण काळजात त्याच्या अणूरेणू गवसायचा नाही. सारे वरच्या वर.
"मी एकदा एका गावी एका इसमाला भेटायला निघालो. झट्कन परीटबुवाने पंचांग काढले, शनि मंगळ बुध गुरु अशी बोटे चाळवली आणि दिला निकाल. काय दिला? माझी नि त्या गृहस्थाची भेट होणार नाही. झालीच तर तुमचे काम तो करणार नाही. फार काय, तुमच्याकडे ढुंकूनहि तो बघणार नाही. “नाही भेटला तर नाही भेटला. नाही बोलला तर नाही बोलला. मला काय त्याचे? पण मी जाणार." बुवाला बरोबरच घेऊन मी निघालो. गावाच्या सीमेवर गावकरी पोरांनी मला पहाताच, गाडगेबुवा आले, गाडगेबुवा आले, असा ओरडा करीत सैरावैरा ती गावात गेली. थोड्याच वेळात मी भेटणार होतो तोच इसम आम्हाला हात जोडून सामोरा आला. मीहि हात जोडून त्याला नमस्कार केला नि गप्प बसलो. तो गृहस्थ म्हणाला- “बाबा, तुमच्या धर्मशाळेसाठी बाजूला काढून ठेवलेले हे ५०० रुपये आणले आहेत, ते आता घ्या." "राहू द्याहो शेटजी, आजच कशाला? पाहू, लागतील तेव्हा. "असे मी म्हणताच तो अगदी गयावया करून म्हणाला, "छे छे बाबा, वाटेल तर आणखी ५०० घालून एक हजार देतो, पण या खेपेला घ्याच." हो ना करता, "द्या या आमच्या बुवांच्या जवळ" असे म्हटल्यावर परीटबुवाच्या हातातच त्याने १००१ रुपयांची पुरचुंडी दिली.
"माझे संभाषण चालले असतानाहि परीटबुवा पंचांग काढून एकसारखा बोटे चाळवीत होताच. शनि मंगळ शुक्र बडबडतच होता. पैसे देऊन शेटजी गेल्यावर तो मला म्हणाला, असे कसे हो झाले हे? ग्रहमान चक्र प्रतिकूल, वाटेल त्या ज्योतिषाला विचारा. खोटे ठरले तर हात कलम करून देईन!" मी म्हटले, "बाबाजी,
नाम देवाजीचे घ्यावे । पुढे पाऊल टाकावे ।
मग तो लागू नेदी शिण । आड घाली सुदर्शन ।
हेच तुकोबाराय सांगतात ना? अहो, दूर अंतराळातल्या थांगपत्ता नसलेल्या शनि मंगळ बुधाचा नि आमचा संबंधच काय मुळी? ज्यांच्याशी संबंध, त्यांच्याशी आपण नीट इमानाने व्यवहारी चातुर्याने वागलो का मनात आणू ते आपोआप घडून येतं. घेतलंत ना प्रत्यंतर हे? मी लक्ष्मीच्या मागे थोडाच धावतो? तिला मी जुमानीतच नाही. म्हणून तीच माझ्या मागे अशी धावते. समजा, शेटजीने नसते दिले पैसे मर माझे काय अडून बसते? बरं आता दिलेच तर ते माझ्यासाठी थोडेच जिकडच्या तिकडे आता होतील रवाना.
तत्त्वजिज्ञासू नि तत्त्वविवेचक बाबा
चहूकडे ऊन्ह रणरणत होतं. पांखरेसुद्धा उष्म्याच्या दावाने झाडांच्या आसऱ्याला विसावून बसली आहेत. मी आणि बाबा कुठेतरी एकाद्या बाभळीच्या सावलीखाली लेटलो आहोत. एकदम बाबा उठले नि मला म्हणाले, "गोपाळ, तुला लिहिता वाचता येते. इतकी पोथ्या पुस्तकं वाचतोस तूं. एक सांग. देवानं हा इतका पसारा कशाला केला?"
"गडबडून जाऊन काहीतरी उत्तर दिलेच पाहिजे म्हणून म्हणालो,
"बाबा, हे चैतन्य खेळतंय सगळीकडे."
"चैतन्य? चैतन्य म्हंजे काय बाप्पा?"
"बाबा, हा सगळा देवाचा खेळ आहे."
"हा कोण्या जातीचा खेळाडू आहे बाप्पा? सांग ना? एक माणूस रडत आहे तर दुसरा हासत आहे. एक मरत आहे तर दुसरा जन्मत आहे. एक मोटरीत बसून रस्त्यावरचा फुफाटा उडवीत पळतो आहे, तर दुसऱ्याच्या पायात घालायला पायताणहि मिळत नाही. तू पाह्यलंस शिकाऱ्याच्या हातून पांखरू मरताना?"
आणि मग बाबा एकदम उभे राहिले आणि साभिनय बोलू लागले. जणू काय एकादा मास्तरच मुलाना घडा समजावतो आहे.
"एक पाखराचं पिल्लू बसलं होतं झाडावर तिकडून आली त्याची माय. तिच्या चोचीत लेकरासाठी घास. मायचा वास लागला नि लेकरू धावलं बाहेर. उडता येत नाही. लहा लहा करीत मायेच्या पंखांत शिरलं, तिनं त्याला मोठ्या मायेनं आपल्या पंखाखाली घेतलं. पिलानं वासली चोच, मायेनं त्याच्या तोंडात घातला चाऱ्याचा घास लेकरू हरिखलं. इकडं तिकडं नाचू लागलं. आता बघ. खाली उभा होता एक शिकारी, त्यानं धरला बंदुकीचा नेम ढोऽऽ.... पट्दिशी माय नि लेकरू पडली खाली. संपला खेळ आता तो शिकारी नि ही पाखरांची जोडी. हा सगळा तुझ्या देवाचा खेळ म्हणावा काय?"
यावर काय उत्तर देणार मी?
दुसरा प्रसंग, वेळ रात्रीची, अनंत आकाशाच्या छताखाली एकाद्या शेकोटीशेजारी बाबा विचारमग्न बसले आहेत. एकदम वळून त्यांनी विचारले, "गोपाळ, हे सगळं कसं केलं असेल देवानं? कशाचं केलं असेल? हा चंद्र, तो सूर्य, या चांदण्या, हे आकाश, पाणी, डोंगर कस केलं असेल? हे सगळं घडवताना देव कुठं बसला असेल? हे सगळं केव्हा केलं असेल? किती दिवस झालं म्हणावं?"
"बाबा, चार हजार युगं झाली." मी उत्तर देण्याचा आव आणला.
"मोजायला तू बसला होतास काय?"
"नाही." मी लाजून म्हटले. "पण..."
"पण कशाचा? कोणाला काहीच कळलं नाही. कोणी काही तरी जुळवून सांगतात आणि लोक माना डोलवतात. हे ज्या वेळी कोणाला कळलं, तो माणूस जिंकला. "
`नासदासीत्` आणि `यस्थामतं` या वैदिक वचनांत तरी आणखी काय सांगितलं आहे?
-मूर्खानन्द
अध्यात्मापेक्षा व्यवहाराची कदर मोठी
कीर्तनांत अनेक संतवचनांचा बाबा नेहमी जो साठा वापरतात, तो साधासुधा उपदेशपर किंवा वैराग्यपर असेल तेवढाच. बाकीचा अद्वैतवादी, ब्राह्मी स्थितिपर किंवा आध्यात्मिक भाग त्यांनी बाजूलाच ठेवला. साक्षात्कार, समाधि, स्वप्नात देवाचे दर्शन, शकुनापशकुन या भानगडी त्यांच्या त्या लोकोत्तर गाडग्यात टिकावच धरू शकत नाहीत. आधी त्यांनी जनींच जनार्दन उघड्या डोळ्यांनी पाहिला, त्याच्या सेवेत एक अभिनव तंत्र स्वतःच काढले, त्याचा यशवंत प्रयोग ते गेली ४७ वर्षे सारखा करीत आहेत, शिकू इच्छितील त्यांना सांगत आहेत. लोकांनाहि `जनीं तूंच जनार्दन, तुझे आहे तुझ्यापाशी, परि तूं जागा चुकलासी` हे कण्ठरवाने सांगत आहेत. अडाण्यांचे अज्ञान घालवून त्यांना कर्तबगार प्रपंचाचा, उद्योगाचा आणि उत्तम व्यवहारें धन वेचावें कसे नि तें उदास विचारें खर्च करावें कसे याचा अखंड उपदेश करीत आहेत. बाबांच्या असल्या उपदेशाने मूळचे हीनदीन दरिद्री शिस्तीच्या उद्योगाने कर्तबगार नि श्रीमंत बनल्याची अनेक उदाहरणे आहेत.
निस्संग बेपर्वा वृत्ति
एका फटिंग नि अखंड भटक्या अशा चिंध्या मडके-काठीधारी माणसाने पश्चिम भारतात अनेक मोठमोठ्या भव्य धर्मशाळा, सदावर्ते, बोर्डिंगे, गोरक्षण संस्था नि पाणपोया उभारल्या कशा आणि एवढा मोठा सार्वजनिक प्रपंच करून स्वतः हा आधुनिक कर्मयोगी सर्वत्र आहे नि कुठेच नाही, अशा वृत्तीने रहातो कसा, याचे आश्चर्य पंडित मदनमोहन मालवीय, महात्मा गांधीजी, शंकराचार्य कूर्तकोटी प्रभृति अनेक थोरथोर विभूतींना वाटू लागले. काशी प्रयागच्या फिरतीवर बाबा गेले असता, मालवीयजींनी मुद्दाम पाळत ठेवून, त्यांना आपल्या पाठशाळेत भेटीला घेऊन गेले. `मुद्दाम पाळत ठेवून` हे म्हणण्याचे कारण, हे मालवीयजी कोण नि महात्मा गांधी कोण, याची बाबांना कधीच पर्वा वाटलेली नाही. असतील, आहेत थोरथोर महात्मे या भारतात, करताहेत ते आपले काम आपापल्या परीने. मला त्यांच्याशी काय काम? ही त्यांची निस्संग बेपर्वा वृत्ति. ते आपले आपल्याच कीर्तन प्रचार संचारात निमग्न. केलेल्या कर्तृत्वाचाच लवमात्र अभिमान नाही, तेथे स्वतःला कसले काही महत्त्व किंवा मोठेपण चिकटवून घेणारच कसे?
मोठमोठे अधिकारी, पुढारी भेटीला येतात, तेव्हा वर्दी गेली म्हणजे बाबा उदगारतात- `माझे काय आहे काम त्यांच्याशी?` बरे कोणी भेटीचे निमंत्रण दिले तरी हाच प्रकार. `माझं काय काम आहे त्यांच्याशी?` भेटीच्या वेळी मान वाकवून दोन हातानी नमस्कार करतील नि गप्प बसतील ऐकत, तो काय बोलतो ते. नाहीतर, `भेट झाली ना? जा साहेब आता.` असे स्पष्ट सांगायलाहि कमी करीत नाहीत.
श्रीमान बाळासाहेब खेरांनी एकदा महात्मा गांधीना गाडगेबाबांविषयी माहिती दिली. त्यांना मोठे आश्चर्य वाटले. त्या अलौकिक पुरुषाला भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. भेटीला या, अशी विनंती किंवा भेटीला जा अशी सूचना बाबाना करण्याची कोणाची प्राज्ञा? तसे ते कोणाच्या भेटीला आपणहून जातच नाहीत. पण वर्ध्याच्या आजूबाजूला बाबांचा संसार चालू असल्यास त्यांची भेट घेण्याचा योग आणता येईल, असे खेरांनी महात्माजींना लिहिले. तसा योग आला.
गाडगेबाबा आल्याची बातमी समाजताच आसपासच्या १०-१५ कोसातली जनता मधमाशासारख्या झुंड्यानी गांधीजींच्या वर्धाश्रमात घुसलेली पहाताच, गांधीजीसुद्धा या सत्पुरुषाच्या लोकसंग्रही आकर्षणाने चकित झाले. आश्रमात येताच गांधीजीनी बसायला एक आसन पुढे केले. बाबांनी उघड्या जमिनीवरच बैठक मारली. पंढरपूरच्या हरिजन धर्मशाळेविषयी आणि इतर संस्थांविषयी भाषणे झाल्यावर, बाबांनी भाकर कांदा मिरचीचे भोजन केले. महात्माजींच्या आग्रहावरून कीर्तन केले आणि स्वारी नमस्कार करून चालती झाली परभणीकडे.
थोरामोठ्यांच्या राजवाड्यासारख्या सदनांतहि बाबांना जाण्याचे योग येतात. तेथेहि ते कधी बैठकीवर बसायचे नाहीत. दूर एका बाजूला जमिनीवरच त्यांची बैठक. कोणी अधिकारी खुर्चीवर बसलेला असेल तर हे बाजूला हवा तितका वेळ, काम होईपर्यंत ताठ उभेच रहातील. सारांश, राजवाडा नि स्मशान यांत त्यांना कसलाच काही भेद वाटत नाही.
अपूर्व लोकप्रियता
गेल्या १०० वर्षांत महाराष्ट्राच्या खडकाळ रुक्ष आणि डोंगराळ प्रदेशात अनेक संत निर्माण झाले, काही काळ लोकादराच्या कळसावर चढले आणि अखेर लोकनिंदेच्या गर्तेत कोसळून नामशेषहि झाले. भक्तोद्धारासाठी कित्येकांनी उभारलेले मोठमोठे मठ आणि शिष्यसमुदाय आज जनतेच्या तिटकाऱ्याचे अथवा थट्टेचेहि विषय झाले आहेत पण बाबांची लोकमान्यता मात्र सागरासारखी एकरसी नि अखंड फोफावती आहे. बुद्धाच्या दातांवर नि केसांवर प्रचंड स्तूप रचून त्यांची जशी भव्य मंदिरे जागेजाग दिसतात, तसे महाराष्ट्राच्या भावनाशील परंपरेने उद्या बाबांच्या काठी चिंध्या नि मडक्यांचीहि स्मारके उभारली जाण्याचा संभव नाही असे नाही. भावना काय उत्पात करणार नाही? चालू घडीला तरी स्वतः बाबाच अखिल जनतेच्या हृदयांत प्रेमादराचे अत्युच्च नि अढळ पद पटकावून बसले आहेत खरे.
मऱ्हाठी समाज अनेक `इझम्`च्या सांप्रदायिक हट्टवादात इतका विभागलेला आहे का त्याचा परिणाम परस्परांच्या रोटी-बेटी-बंदीपर्यंत ताणलेला आहे. पण `गाडगेबाबा` हे नुसते नाव कानी पडताच किंवा त्यांचे समोर दर्शन होताच, हे सारे `इझम्` भराभर आपल्या विरोधाच्या पोलादी पाकळ्या मिटून एकत्र एकजीव एकवटतात. बाबांच्या चाहत्यांत नाही कोण? सारे आहेत. काँग्रेसी आहेत, कम्युनिष्ट आहेत, सनातनी आहेत, सुधाकर आहेत, आस्तिक आहेत आणि माझ्यासारखे नास्तिकहि आहेत. भोळ्याभाबड्या नि अनाडी खेडूतांच्या बरोबरीने जहाल बुद्धिवादीहि आहेत. जो जो बाबांकडे पहातो, त्याला त्याला ते आपल्याच `इझम्`च्या रंगात रंगलेले दिसतात. या भेदातीत आदराची कारणे मोठी मजेदार आहेत. बाबांच्या व्यक्तित्वाचे पैलू जसे अनेक, तशी त्यांची किरणेहि इंद्रधनुष्यासारखी अनेक म्हणावा तर विरोध आहे, नाही तर नाही.
बाबा हे जितके त्यागी आहेत, तितकेच संसारी आहेत. ते जितके ममताळू आहेत, तितकेच कठोर आहेत. जितके विरक्त, तितकेच संग्राहक ते निर्मोही आहेत आणि व्यवहारी प्रापंचिकहि आहेत. वृत्तीने जितके सरळ तितकेच कोणाबरोबर कुठे काय नि किती बोलावे याची व्यवहारी धूर्तता बाळगणारे आहेत. त्यांनी स्वतःच्या घरादाराचा हुळा भाजला. प्रपंचावरील स्वामित्वालाहि तिलांजली दिली. असल्या या फटिंग फकिराने जागोजाग उभारलेल्या धर्मशाळा घाट पाणपोया गोवर्धनी संस्था सदावर्ते आणि अन्नवस्त्रदानाची प्रथा पाडून मोठमोठ्या कोट्यधीश अमीरांनाहि लाजवले. समाजाची द्रव्यशक्ति एरवी जी कदाचित भलत्याच मार्गाला लागती, ती त्यांनी कुशलतेने एकटवून सुयोग्य दानाच्या पाटांतून सगळीकडे खेळविली. धर्मशाळादि सर्व संस्थांचे ट्रस्टडीड केलेले असूनहि ट्रस्टींच्या स्वाधीन असलेल्या बेवारशी इस्टेटीप्रमाणे, तेथला व्यवहार वाऱ्यावर मोकळा सोडलेला नाही.
प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे... पंढरपूर नाशिक या धर्मशाळांतून यात्रेकरूंच्या सुखसोयीसाठी नाना वस्तूंचा त्यानी संग्रह करून ठेवलेला आहे. अगदी चिमटा उलथण्यापासून तो मोठमोठ्या हंड्या परातीपर्यंत हरएक उपयोगाची भांडी घासून पुसून लख्ख केलेली नंबरवार सेवेला सिद्ध. पट्टीच्या संसारी व्यवहारी माणसाने येथील टापटीप पाहून लाजावे नि धडा घ्यावा. धर्मशाळेचा कोनाकोपरा अत्यंत स्वच्छ. केराची कणहि आढळायचा नाही. स्वच्छता आणि आदर हा येथला ठळक ट्रेड मार्क. स्वच्छतेचे बाबांना इतके वेड का तेवढ्यासाठी त्यांनी आपली एक विशिष्ट खराटा संस्कृतीच निर्माण केली आहे म्हणा ना. नाशिक पंढरपूर येथील धर्मशाळांत दोन दिवस राहून आलेल्या प्रत्येक माणसाचे मन त्याला साक्ष देईल की या वास्तु ज्या महात्म्याने निर्माण केल्या, तो फार मोठा कलाकार, चित्रकार किंवा सिनेमाच्या भाषेतच बोलायचे तर शतावधानी आर्ट डायरेक्टरच असावा. कोणत्याहि धर्मशाळेत बुवाजी गोसावी आणि कुष्ठरोगी यांना वसतीची परवानगी नसते, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. सदावर्तांत कुष्ठ्यांना अन्नदान मात्र अगत्य मिळते.
झंजावाती संचाराचा क्रम
साधकावस्थेत रेल्वेच्या प्रवासात झालेल्या हालअपेष्टांची माहिती मागे सांगितलीच. पुढे बाबांचे माहात्म्य जसजसे वाढत गेले, तसतसे रेलवे प्रवासात हमालांपासून तो स्टेशनमास्तर इनस्पेक्टरादि अधिकारी त्यांचा जागोजाग आदरसत्कार करू लागले. अखेर तर जी. आय. पी. च्या ट्राफिक सुपरटेण्डंटांनी अतिशय आग्रह करून बाबांसकट सगळ्या अनुयायांना सर्व लाईनभर मोफत प्रवास करण्याचे पास देऊ केले. बाबांसाठी फर्स्ट क्लासचा पास पुढे करताच, `आम्हाला तुमचे पासच नकोत.` असा नकार दिला. कसेबसे थर्ड क्लासचे पास मिनतवारीने घेतले. जेमतेम ते वर्षभर वापरून, "हवेत कशाला हे पास आपल्याला? सगळी दुनिया आपल्याला मोकळी." असे सांगून सारे पास परत केले.
एरवी रस्त्याने जातानाहि पुढेपुढे बाबांना मनस्वी त्रास होऊ लागला. बाबा दिसले रे दिसले का दुरून का होईना पण त्यांना दोन हात जोडून नमस्कार करणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या टोळ्याच्या टोळ्या चहूबाजूनी भराभर जमा व्हायच्या. मुंबईसारख्या शहरात तर अनेक वेळा या गर्दीच्या रहदारी कोंबून जायची नि पोलिसांची तिरपीट उडायची. एकीकडे लोक गर्दी करून बाबांच्या पायांना हात लावण्याची धडपड करीत आहेत नि बाबा `चलो, हटो दूर` ओरडत हातातली काठी जोरजोराने आपटीत वाट काढीत आहेत, असा देखावा वरचेवर होऊ लागला. सहज फर्लांगभर चालायचे तर एक तास लागू लागला. ठरलेल्या कार्यक्रमांत गोंधळ उडू लागला. अखेर अनेक भक्तजनांनी विनवण्या करकरून प्रवासासाठी बाबांना एक प्रचारतंत्री मोटर दिली आहे आणि अलीकडे बाबांची फिरती मोटरीतून होत असते. तरीही त्यांचा बहुतेक खेड्यापाड्यांचा मैलोगणति दौरा आजहि बेधडक पायपिटीनेच होत असतो. रेलवे काय किंवा मोटार काय, कशावरहि अवलंबून बसायचे नाही, लहर आली का चालायला लागायचे हा मूळचा क्रम चालूच आहे.
निष्कांचनाची कांचन- किमया
धर्मशाळादि संस्थांना हजारो रुपयांच्या देणग्या देणारांत लाखाधीशापासून खाकाधीशापर्यन्त सर्व जातीचे, धर्माचे नि व्यवसायाचे लोक आहेत. त्यांची ठळक अक्षरांत रंगवलेली नावे मोठमोठे फोटो धर्मशाळांच्या सभामंडपात आढळतात. एका फटिंग मडकेधारी बैराग्याने हा लक्षावधि रुपयांचा प्रचंड प्रपंच उभारण्यासाठी पैसा पायांशी आणला कसा? हे वर्तमान युगातले एक मोठे नवलच आहे. एकाहि दात्याचा तांब्याचा फद्या चुकून कधी बाबांच्या हाताना चाटून गेलेला नाही आणि पैशाच्या या लाखी व्यवहारात कधी कोठे अफरातफर झालेली नाही, स्वतः नाक्षर असूनहि ठिकठिकाणच्या ट्रस्टींच्या कारभारावर बाबांची चोखंदळ नजर गरुडासारखी भिरभिरत असल्यामुळे त्यांनाहि कमाल कसोशीने लहान मोठी रोजची कामे वक्तशीर आणि कमाल शिस्तीने पार पाडावीच लागतात या बाबतीत श्री. मूर्खानन्दजीचीच माहिती येथे देतो-
"याचकांचे राजे म्हणून महामना मालवीयजींची जी कीर्ती अखिल भारतात आहे, तीच बाबांची महाराष्ट्रात आहे. श्रीमंतांच्या तिजोऱ्यात निष्कारण कुचंबत पडलेली लक्ष्मी बाहेर काढून सत्कारणी लावण्याचे बाबांचे `योगः कर्मसु कौशलम्` चातुर्य अनन्यसामान्य होय, पै नि पैचा हिशोब रोखठोक स्वतःच्या सहीची निशाणी अंगठा टेस्टपत्रांवर किंवा सहीची जरूर पडेल तेथे तेवढ्यापुरतीच बाबांच्या आंगठ्याला शाई लागायची. पण हिशेब? त्याबाबात आम्ही नेहमी एकमेकांत बोलायचे का बाबा पेशवायीत कुणीतरी फडणीस असावेत.
"जवळ एक छोटीशी पिशवी असून तींत एक अंदाजे १०० छोट्या पानांची ३x६" आकाराची उभी शिवलेली एक वही असते. त्या वहीत ब्रह्माण्ड भरलेले! गावोगावच्या महत्त्वाच्या माणसांची नावे पत्ते, देणग्यांची तारीखवार यादी, अंधपंगूंसाठी कुठे किती घोंगड्या कटोरे पाहिजेत त्यांची नोंद, पुढल्या १५ दिवसांचा कुठकुठे जायचे त्याचा कार्यक्रम, अनेक ठिकाणी बंद झालेल्या आणि बंद करावयाच्या पशुहत्येची यादी, जागोजागच्या चालू बांधकामाचे भूत वर्तमान नि भविष्य, लाख गोष्टी त्या चिमुकल्या चोपड्यात अगदी बारीक सुवाच्य सरळ अक्षरांनी लिहिलेल्या असायच्या. ज्याचे अक्षर असे उत्तम त्यावर बाबांची मर्जी मोठी. कुठेहि एकाद्या झाडाखाली तळ पडला म्हणजे कुणाकडून तरी शाईदीत मागवायची, टाकाला राणीपेन बोथीच हवी. मग बाबा एकाग्र चित्ताने डोक्यात साठवलेले माहितीचे साहित्य भराभर सांगायचे नि मी ते नीट जुळवून लिहायचे. वाचताना पट्कन चूक दाखवायचे."
एखाद्या धर्मशाळेत गेले का ट्रस्टी कारभाऱ्यांना कोणता प्रश्न नेमका विचारतील याचा थांग लागायचा नाही. त्याने जमाखर्च वाचावा नि बाबांचा पट्कन "हे असं कसं केलं तुम्ही? ते तसं ठरलं होतं. सुधारा ती चूक आणि लिहा अमक्यातमक्याना तसं केलं म्हणून" असा करा हुकूम सुटला का फर्डा फडणीसही सदानकदा डोळ्यांत तेल घालून आपल्या आकडेमोडीची शिकस्त करीत राहिला तर त्यात नवल कशाचे?
बऱ्याच गारगोट्या, काही हिरे
वरवर शांतिब्रह्म दिसणारे गाडगेबाबा खरे म्हणाल तर प्रज्ज्वलित अग्नीचा धगधगता ज्वालामुखीच होत. खोटेनाटे दांभिक नकली नाणे त्यांच्यापाशी टिकायचेच नाही. एका फूत्कारात जळून खाक! बाबांचा लोकसंग्रह अत्यंत डोळस आहे. आंधळा नाही. शिष्य शागीर्द किंवा पाठ-चाले (अनुयायी) म्हणविणाऱ्या अनेकांनी बाबांच्या जवळिकेचे उचित आणि अनुचित उपयोग करून घेतले आहेत. संचार-प्रचाराच्या अगदी सुरुवातीपासून भजनांची साथ करण्यासाठी किंवा बाबांच्या खराटा - कर्मयोगात झिजण्यासाठी आजवर शेकडो शिष्य आले. अगदी थोडे टिकले. बाकीचे वाटेला लागले. बाबा आपल्याला शिष्यसुद्धा मानीत नाहीत, कधी प्रेमाने जवळ करतात तर कधी तडकावून धुडकावतात, हे खासखूस माहीत असूनहि निर्धाराने बाबांच्या सेवाकार्याला चिकटून राहिलेले आणि कसोटीला उतरलेले अनेक झाले आणि आज आहेत.
त्या हिऱ्यांच्या जोडीने आलतूफालतू गारगोट्यांचा भरणाहि पुष्कळ झाला. बाबांचा लौकिक वाढू लागला. `बाबांचा शिष्य` म्हणताच लोक हव्या त्या माणसाच्या पाया पडतात. विरक्तीच्या थोड्याशा बतावणीने काय हवे ते लोक देतात. या वरवरच्या देखाव्याला भाळून शिष्य नामधाऱ्यांची संख्या वाढत गेली. घरदार आईबाप गणगोत टाकून बाहेर सटकणारांच्या सबबी अनेक असतात. अन्ननिवाऱ्याचा सुगावा काढीत असले भणंग भटक्ये बाबांच्या छावणीत यायचे. जुन्या सेवकांबरोबर काही दिवस काढले का चढवला आंगात एक तांबडा डगला, त्यावर चौकडीबाज घोंगडीचा एक पट्टा, हातात टमरेल नि काठी, का निघाली स्वारी उपदेशकाच्या जाम्यानिम्याने प्रचारासाठी बाहेर! असल्या कितीतरी हिणकस नामधारी गाडगे-शिष्यांनी गावोगावी बाबांच्या नावावर पैसे कपडे काही वस्तू नि मेजवान्याहि उकळल्याच्या तक्रारी पुराव्यासकट नाव - निशीवार माझ्या हाती कितीतरी आलेल्या आहेत. असल्या शिष्यपुंडांना प्रेमाने जवळ घेऊन सुधारण्याचा बाबांनी खूप यत्न करावा. कडू कारले तुपात तळले नि साखरेत घोळले तरी कडूच, अशी अनेक कारली आपणहून बाजूला पडली; सडली नि नामशेष झाली.
पाडाला लागलेले काही आंबेहि नासले
दीन-दलितोद्धार, गोसंरक्षण, रुढी- निर्दाळण आणि पशुपक्षि हत्याबंदीच्या बाबांच्या कार्यात अनेक वर्षे हिरिरीने भाग घेऊन त्यांच्या कसोटीला आता उतरणार, इतक्यात लोभ मोहाच्या तडाख्यात सापडून डागळलेले काही शिष्यहि आहेत. बाबांची कीर्तने लोकांचे अज्ञान झाडून त्यांना शहाणपणा नि माणुसकी शिकवण्यासाठी, तर लोभाला बळी पडलेल्या या प्राण्यांची कशासाठी? तर म्हणे या ना त्या राजकारणी पार्टीसाठी तालुका जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुका लढवण्यासाठी! एकीकडे `गाडगेबाबांचे शिष्य` म्हणून मिळणारा लोकांचा आदर आणि वर त्या उपटसुंभ प्रचारकार्यासाठी आपोआप मिळणारी छन् छन् रोख रुपयांची दक्षणा! कोणा मानवाच्या कार्याच्या तोंडाला सुटणार नाही पाणी? त्या खटपट्यांच्या मेळाव्यात या दामानंदजींचा भाव वधारला, पण अग्निदेव गाडगेबाबांच्या तृतीय नेत्राच्या एकाच वटारणीने तो भाव, ते मानपान आणि ती उसनी बैराग्याची ऐट क्षणार्धात जळून खाक! गाडगेबाबांचे लोकसेवेचे तंत्र म्हणजे एक खोल दरीत तुटलेला भयंकर सुळक्याचा कडाच! त्यावर चालताना जरा वाकडे पाऊल पडले का झालाच चालणाराचा कपाळमोक्ष!
गाडगेबाबांचे नांव - एक हुकमी टांकसाळ
गेल्या ५० वर्षांच्या कीर्तन-संचारात मला पैसा द्या किंवा माझी अमूक सोय करा, असा एक शब्दहि बाबांनी चुकून तोंडावाटे कोणाजवळ काढलेला नाही. कोठेहि जायचे, कीर्तन करायचे आणि पार दूर निघून जायचे, एवढेच त्यांना माहीत. तरीहि लाखो रुपयांच्या देणग्या घ्या घ्या म्हणून त्यांच्याकडे आल्या. त्यांतल्या फुटक्या कवडीलाहि स्वतः स्पर्श न करता, त्या धन राशींनी जागोजाग मोठमोठ्या धर्मशाळा घाट गोरक्षण संस्था नि पाणपोया लोकांकडूनच उभारल्या आणि ट्रस्टींच्या हवाली केल्या. हासुद्धा अनेकांना एक चमत्कार वाटण्यासारखा आहे.
या चमत्काराचाहि त्यांचे काही शिष्य म्हणविणारे लोक हुकमी टांकसाळीसारखा कसा फायदा उकळतात, ते मी स्वतःच दादर शिवाजी पार्क मैदानावर पाहिले आहे. एरवी कोणत्याहि सार्वजनिक कार्याला पैसे काढणे मोठे कठीण कर्म झाले आहे. पण गाडगे महाराजांच्या अर्धशतकाच्या लोकहितवादी कर्मयोगाची बहुजनसमाजावर अशी विलक्षण मोहिनी पडलेली आहे की गाडगे महाराजकी जय असा जयघोष होतांच, फेरीवाले कल्हईवाले तेली पानवाले तांबोळी पाटीवाले, कोणीहि असोत, भराभर जयघोषवाल्यांवर पैशांचा पाऊस पाडतात. शिवाजी पार्कातल्या कीर्तनवाल्यांनी बाबांच्या नावावर एक तासात आठ हजार रुपयांचा गल्ला जमा केलेला मी पाहिला.
जागोजागच्या या पैसा उकळणीविषयी बाबा वारंवार कीर्तनांत लोकांना इशारे देतात. अहवाल पुस्तकांतून जाहीर सूचना देतात. यापेक्षा त्यांनी आणखी काय करायचे?
स्वतंत्र खुराड्याचे मठवाले
मठ देवळे संप्रदाय गण्डेबाजी तीर्थयात्रा नि चारी धाम या फिसाटांचा बाबांनी आजवर कडक निषेधच केलेला आहे. यज्ञयागहि त्याज्य असे ते सांगतात. या निषिद्ध गोष्टी आचरून बाबांच्या निर्मळ मनाला नाराज करणारे काही विघ्नसंतोषीहि पैदा झाले.
बाबांच्या कसोटीच्या परीक्षेतून कसेबसे बाहेर पडलेले आणि बाबांच्या नावावरच मिळालेल्या लोकमान्यतेच्या भांडवलावर हटातटाने पटा रंगवून नवनवीन मठांची उठाठेव करणाऱ्या बाया नि बुवांचा एक वर्ग तयार झाला आहे. त्यांनी आपला एक नवाच शिष्यांचा गोतावळा जमा केला. `गाडगे महाराजकी जय` या जयघोषांवर लोकांकडून हजारो रुपये कीर्तनांच्या जागी सफाईत उकळण्याची किमया चालवली. कारकून, कारभारी, सेक्रेटरी नि मॅनेजर कामाला लावले. लांबलांबच्या तीर्थयात्रांसाठी दिंड्यांचे ढोंग काढले. गावोगाव दक्षणा जेवणावळी सन्मान-सत्कारांचा पाऊस पडू लागला. मठ बांधले. यज्ञ पेटवले. अन्नदानांची खैरात केली. वृत्तपत्री प्रसिद्धीसाठी बातम्या मुलाखती लेख फोटोंची कमाल करामत केली. अखेर काय? बिचारे कांचन-कामिनीच्या कोर्ट-कचेऱ्यांच्या लफड्यात गुरफटले! उप्पर तो और बनी, अंदरकी बात राम जाने, असा मामला झाला.
कसोटीचे कार्यकर्ते
गारगोट्यांचा भरणा असा कितीहि असला तरीहि बाबांच्या अवतीभवती आजहि अनेक निष्ठावंत कार्यकर्ते बाबांच्या शिस्तीने लोकसेवेचे महान कार्य करीत आहेत. निःस्पृहतेचा हा वासुदेव टाळ चिपुळिया वाजवीत धीर गंभीर ऐरावतासारखा पुढे चालला आहे. आघाडीला साधनेचा नंदादीप शांतपणे तेवत आहे आणि पाठोपाठ या महान सत्पुरुषाच्या एकनिष्ठ सेवकांची मांदी मिटल्या तोंडी चालली आहे. गावोगाव हातात खराटा घेऊन लोकांचे अज्ञान दारिद्र्य नि हालअपेष्टांचा केरकचरा झाडीत. बाबा या सगळ्यांमध्ये आहेत आणि या सगळ्यांपासून दूरहि आहेत. अगदी एकटे. कारण ते ना कुणाचे गुरू, ना त्यांना कुणी शिष्य.
मेणाहुनि मऊ, पण -
बाबांच्या ममताळूपणाची कल्पना त्यांच्या सहवासात १०-१५ दिवस राहिल्याशिवाय येणार नाही. ते `रहाणे`सुद्धा सामान्य प्राकृत माणसाला एक दिव्यच वाटेल. पायांवर कायमचा भोवरा गरगरत असलेल्या त्या तुफानी वाऱ्याबरोबर एका जागी स्थिर रहाताच येणे शक्य नाही. सिग्नल दिला नाही तर पंजाब मेलसुद्धा हवा तो स्टेशन मास्तर थोपवून ठेवू - शकतो. पण बाबांच्या पायदळ मेलगाडीला थांबवण्याची कुणाचीहि छाती नाही. `निघा` म्हटले का त्यांची पावले लागलीच चालायला.
एरवी हिमालयाप्रमाणे धीरगंभीर वृत्तीने लोकांच्या नि पशुपक्ष्यांच्या हालअपेष्टांनी कळवळणारा आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी वाऱ्यासारखा धावत जाणारा हा दयासागर, असत्य अन्याय दंभ कर्तव्यात कुचराई दिसली का एकदम बज्राहूनहि कठोर होतो. स्वतःच्या पुत्राच्या मृत्यूची बातमी ऐकूनहि जो हिमालयासारखा निर्विकार राहतो, तोच खाडीत पडलेल्या एका गाईसाठी बेधडक समुद्रात उडी घेऊन तिला काठावर आणतो आणि उपचार करून तिला चालली हालती घरी पाठवतो. या माणसाच्या स्नेहाळूपणाने पाघळून एकादा विशेष सलगी करू म्हणेल, तर त्याला काठीचा फटका खाऊन "चल हो चालता इथनं" हा प्रसाद मिळाल्याशिवाय रहाणार नाही.
चारधाम दिंडीवाल्यांची हजेरी
काही दिवसांपूर्वी गाडगे महाराजकी जय करीत चार धामाची प्रचंड यात्रा आणि अखेर एक मोठा यज्ञ करणाऱ्या बाया बुवांची धामधूम वर्तमानपत्रांत गाजलेली पुष्कळांच्या स्मरणात असेल. त्यात गाडगेबाबांचेहि नाव गोवले गेल्यामुळे, बाबांविषयी अनेक गैरसमज फैलावलेले होते. वृत्तपत्री गाजावाजाची टीका टिपणीची बाबा कधीच दाद घेत नसतात. इतर बाबीप्रमाणेच मला काय त्यांचे? हा त्यांचा दण्डक कायम असतो. चार धाम काय नि शंभर धाम काय, यात्रा काय नि दिंड्या काय, बाबांनी या फंदाचा कडकडीत निषेध अखंड केला नि आजहि करीत असतात. खुद्द या चारधामवाल्या दिण्डी गणंगांचाहि थेट त्यांच्या मेळाव्यात जाऊन बाबांनी अनेक वेळा धिक्कारहि केला. घरदार टाकून दिंडीबरोबर निघालेल्या अनेक भटक्यांची कानउघाडणी करून परतवले सुद्धा.
महायज्ञाचा डांगोरा पिटणाऱ्या मोठमोठ्या जाहिराती महाराष्ट्रभर फडकल्या. आसेतुहिमालयातून मोठमोठे साधूसंत यज्ञाला येणार आणि आमच्या गुरुमहाराज गाडगेबाबांचे त्यांना दर्शन होणार; फार काय, पण तो महायज्ञ खुद्द गाडगे महाराजांच्याच खास नेतृत्वाखाली होणार, अशा अर्थाच्या जाहिरातींमुळे तर बाबांविषयी गैरसमजांचे अनेक उलटसुलट प्रवाह वृत्तापत्रांत वाहू लागले.
अखेर ज्ञानोबांच्या आळंदीला बाबांचा फेरा आला असता, त्या चारधामवाल्या याज्ञिक बाया बुवानी बाबांची भेट घेऊन, आपली सर्व महान् धार्मिक कर्तबगारी कथन केली आणि महायज्ञाच्या वेळी बाबांनी पंढरपूरला अगत्य येऊन अखिल भारतीय संतमंडळींना दर्शन द्यावे, अशी प्रार्थना केली. बाबांनी त्यांची चर्पटपंजरी मुकाट्याने ऐकून घेतली.
बाबा, आपण आला नाहीत तर आमची मोठी फजिती होणार आहे.
बाबा - कुणी सांगितलं होतं या फंदात पडायला तुम्हाला? ज्याने करावे, त्याने भरावे. मला या लफड्यात कां बाप्पा गोवता?
चाधावा. (चारधामवाले) - बाबा, स्वप्नात तुम्ही साक्षात्कार दिलात म्हणून... आम्ही हे सारे केलं.
बाबा - मायबापांनो, कां माझी गरिबाची अशी बदनामी करता? दृष्टांत साक्षात्कार ही सारी थोतांडे आहेत, यात्रा जत्रा यज्ञ ही ढोंगे आहेत, हे जन्मभर मी घसा फोडफोडून सांगत असता, मलाच ओढता या लफड्यात? चला चालते व्हा इथनं. एक शब्द बोलू नका. तुमचं ते यज्ञबिज्ञाचं लफडं पुरं होईपर्यंत पंढरपूरचे तोंड नाही पहाणार मी.
चाधावा - पण बाबा, आम्हाला नेहमी तुमची प्रेरणा होते...
बाबा - मग जा घेऊन त्या प्रेरणेला आणि करा उभी यज्ञाजवळ. माझं काय काम तिथं? चला निघा इथनं.
चाधावांची अशी धुळपट काढल्यावर त्यांनी बाबांच्या समजुतीसाठी अनेक मध्यस्थी घातले. बाबांनी अखेरचा जबाब दिला, "तुमच्या चारधामाचे नि महायज्ञाचे मोठमोठे जाहीरनामे माझं नाव घालून हिंदुस्थानभर फडकवले आहेत. विचारलं होतंत आधी मला? आता असं करा. यज्ञाच्या वेळी जे साधू संत यात्रेकरू पंढरपूरला येतील, त्यांच्या जेवणावळीची खरकटी आणि त्यांची विष्ठा झाडायला गाडगेबुवा स्वतः हातात खराटा घेऊन उभे टाकणार आहेत, असा दुसरा नवा जाहीरनामा द्या फडकावून जिकडंतिकडं, असं कराल तरच येतो तेवढ्याच कामासाठी. परवडत नसेल तर चला उठा, जा आपापल्या कामाला."
बाबांनी या महायज्ञाच्या फंदात कसलाहि काही भाग घेतला नाही. हे निराळे सांगावयालाच नको.
बिनतोड सरळपणा
बाबांच्या सरळपणाला तोड नाही. त्यांच्यावर विश्वास टाकणारा कोणीहि माणूस फसणार नाही. आजवर फसला नाही. कपट अपहार स्वप्नात त्यांना ठावे नाहीत. थोडीबहुत ओळख झाली, काही बोलणे झाले, एवढ्याच विश्वासावर कोणी त्यांना बनवून फसवू म्हणेल ते बिलकूल शक्य नाही. महात्मा गांधींशी कसे बोलावे, बाळासाहेब खेरांशी कसे वागावे. डॉ. आंबेडकर भेटले म्हणजे त्यांच्या वकिली पेचपाचांच्या मुद्यांना थोडक्यात पण समर्पक उत्तरे कशी द्यावी, भाऊराव पाटलांशी व्यवहार कसा करावा, नाना पाटील भेटीला आले म्हणजे किती बोलावे, तुकडोजी बुवांच्या `राष्ट्रीय` विवंचनेच्या सवालांची वासलात कशी लावावी, मुसलमान किंवा (पूर्वी) इंग्रेज अधिकाऱ्यांच्या मुलाखतीत कसे बोलावे, इत्यादि व्यावहारिक तत्त्वे ते जन्माबरोबरच घेऊन आलेले दिसतात. पुष्कळ वेळा असे वाटते का गाडगेबाबा साधू झाले नसते तर स्वतंत्र भारताचे परराष्ट्रीय वकील खास झाले असते.
लोक-श्रद्धेला वळण लावले
बाबांच्या लोकप्रियतेची कारणे येथेच संपत नाहीत. ज्या समाजांत ते वावरत आहेत, त्यांच्या मनोवृत्तीचा श्रद्धाळू भागहि विचारात घेतला पाहिजे. व्याख्या काहीहि करा. भारतीयांची एक विशिष्ट संस्कृति आहे आणि ती थोड्याफार फरकाने व्यक्तिमात्राच्या पिंडी ब्रह्मांडी भिनलेली आहे. `धर्म म्हणजे अफूची गोळी` असा बकवा करणारा हिंदी कम्युनिस्ट लेनिन स्टालिनच्या फोटोला हार घालून त्यापुढे उदबत्ती लावतो, डोळे मिटून प्रार्थना करतो. निधर्मी राज्याचे फतवे फडकवणारे काँग्रेस राज्यकर्ते महात्मा गांधींची मृण्मय रक्षा गंगा यमुना गोदा कृष्णा इत्यादी नद्यांत बादशाही थाटामाटाने सोडण्याची कसोशी करतात. पंडित जवाहरलाल नेहरूंसारखा कट्टर बुद्धिवादी कोण आहे? पण त्यांनाहि स्वित्झर्लण्डात मरण पावलेल्या आपल्या प्रिय पत्नीची रक्षा प्रयागावर आणून गंगार्पण केल्याशिवाय राहवले नाही. काय घ्यायचे यावरून? इझम् कोणताहि असला तरी परंपरेने आलेल्या श्रद्धेनेच भारतीय व्यक्तीचे जीवन आकर्षित झालेले आहे. या श्रद्धेला हवे तर अंधश्रद्धा म्हणा; पण ती आहे.
श्रद्धेच्या नाजूक भावनाना डिवचूनच आजवर हजारो परान्नपुष्ट बुवा बैरागी नि फकीर जगत आले. आज देशासमोर अन्नटंचाईच्या घोर संकटाचा प्रश्न आ वासून उभा आहे तरीहि आणि निरुद्योगी ऐदी चंगीभंगी बुवा फकिरांना पोसण्यात काय शहाणपणा, एवढे मनाला पटत असूनहि, दारी येईल त्याला पसाभर भीक घालण्याची लोकांची श्रद्धेची भावना होती तशी कायम आहे ना? अंधश्रद्धेने होणाऱ्या या प्रचंड अन्नदानाचा ओघ गाडगेबाबांनी अत्यंत निराश्रित आणि हतबल अशा हजारो अंध पंगू कुष्टी यांच्या जीवनधारणेकडे वळविण्यात दाखवलेली कुशलता आणि लोकमताला दिलेली कलाटणी वाखाणण्यासारखी नाही असे म्हणता येईल काय? बाबांचे नाव ऐकताच लाखोलाखो खेडूत रोमांचित होतात, त्यांच्या दर्शनासाठी चुकलेल्या वासरासारखे धावतात ह्यांचे रहस्य येथेच आहे. ओली कोरडी भाकर आणि कांदा मिरची एवढ्यावरच स्वतःच्या गरजांचे शून्य करून, इतर अभागी बुभुक्षितांना मिष्टान्नांची सहस्रेभोजने घालणारा महाभाग, हा चालू काळचा एक जिवंत चमत्कारच जनतेला वाटतो.
कर्मयोगी कीर्तनकार
कीर्तनासाठी अमूकच व्यवस्थेची जागा हवी, अमूकच भजनी साथीदार हवेत, दिव्याबत्त्यांची रोषणाई हवी, असा कसलाहि काही बाबांचा कटाक्ष नसतो. `कीर्तन करा` असे लोकांनी म्हटले का त्यांनी उचललेच दोन दगड टाळांच्या ऐवजी आणि केलीच `रामकृष्ण हरि जय` भजनाला सुरुवात. परवा देहूला असाच योग आला. त्याचे दर्शन शेजारच्या चित्रात आहे. दगडाच्या टाळ चिपळ्या करून ज्या ठिकाणी संतशिरोमणि तुकाराम महाराज विठ्ठल नामघोष करीत, त्याच देहू क्षेत्रात श्री गाडगेबाबांनी मस्तकावर मडक्याचे टवकळ ठेवून, दगडाच्या टाळांनी भजनाला प्रारंभ करताच, बाजूला जमलेल्या हजारो यात्रेकरूंच्या डोळ्यांत भावनाश्रू डबडबले आणि हरिनाम घोषाचा तेथे मुसळधार पाऊस पडला.
बाबांची कीर्तने लक्षपूर्वक ऐकली तर हा माणूस मूर्तिपूजेपेक्षा मानवातील मानव्यरूपी परमेश्वरावरच कडकडीत श्रद्धा ठेवणारा आहे, हे चद्दिशी पटते. नाशिक पंढरपूर आळंदी देहू इत्यादि ठिकाणी मोठमोठ्या धर्मशाळा बांधल्या नि सदावर्ते अन्नसत्रे चालू केली. पण तेथल्या क्षेत्रस्थ देवदेवतांचे त्यांनी क्वचितच दर्शन घेतले असेल. जगाचा नियंता परमेश्वर दगडाधोंड्याच्या असल्या स्वरूपात वसलेला किंवा बसलेला असतो, या खुळावर त्यांची लवमात्र श्रद्धा नाही. इतके सत्य पटलेले असूनहि श्रद्धाळूजनांचा बुद्धिभेद चुकूनहि ते करीत नाहीत. आषाढी एकादशीच्या प्रसंगी एकदा कोणीसे बाबांना म्हटले, "बाबा, देवदर्शन घेऊन आलात का देवळातून?" त्यावर माणसांनी फुललेल्या चंद्रभागेच्या पात्राकडे घाटाकडे हात दाखवून बाबा म्हणाले- “हा समोर जागता बोलता नाचता विठ्ठल दिसत असता, देवळात जायचेच कशाला? देव काय देवळात बसलाय वाटतं? जिकडं नजर टाकावी, तिकडं तो अपरंपार भरलेला आहेच." तात्पर्य, लोकांच्या धर्मश्रद्धेची एकाद्या खाटकासारखी चिरफाड न करता, `लेकुराच्या साठी, पंते हातीं धरिली पाटी` या तुकोक्तीप्रमाणे त्या श्रद्धेला हळुवार बुद्धिवादी वळण लावून ती सत्कारणी लावण्याचाच उद्योग त्यांनी चालवला आहे.
कीर्तनकाराचा पेशा निवडण्यात बाबांची धोरणी चतुराईच दिसून येते. दर दिवशी कोठे ना कोठे हजारो आबालवृद्ध स्त्रीपुरुषांना विठ्ठल रखुमाई, गोविंद राधे, एकनाथ तुकाराम या थोरथोर संतांच्या जयजयकाराने त्यांचे मोठेपण कशात आहे आणि ते आपण आंगी आणण्यासाठी काय करावे, याचेच शिक्षण ते देत असतात. त्यांचे अखंड नामस्मरण माणसाला देवपणा देते आणि कोंबडी बकरी मारून देवाला संतुष्ट करू पहाणारे परमेश्वराचा कोप ओढावून घेतात, हे सिद्धांत रसाळ वाणीने आणि असामान्य तळमळीने जनमनांवर पटवणारा पटाईत कीर्तनकार म्हणून गाडगेबाबांचे स्थान आज सर्वोच्च आहे. पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात धंदेवाईक वारकऱ्यांचे भजनी फड कितीहि पडलेले असोत, गाडगेबाबांचे कीर्तन चालू झाले रे झाले अशी हाक कानी येताच, जनतेचा गंगौघ भरारा तिकडे धावत जातो आणि फडकरांच्या समोर त्यांचे मोजके टाळ मृदंगवालेच तेवढे शिल्लक उरतात, हा देखावा नेहमी पहायला मिळतो.
माया ब्रह्म साक्षात्कार समाधि मोक्षाच्या गाळात अडून बसलेली परमार्थाची गंगा बाबांनी नेटक्या मऱ्हाठी भाषेच्या पाटांनी अफाट बहुजन समाजांच्या मनांगणावर खेळवली. ज्ञानेश्वर तुकारामादि संतांच्या अभंगावरील केवळ शाब्दिक चर्चेतच अडकून पडलेल्या पंडिती कीर्तनकारांना त्यांची वाट मोकळी ठेवून, सोप्या गावंढळ रोजच्या भाषेत रसाळ दृष्टांतानी व्यवहारांत हरघडी घडणाऱ्या अनुभवांच्या दाखल्यांनी आणि सडेतोड खटक्यांनी `आंगठे निशाणी` ग्येन्बा-पांडवाना जगण्या मरण्याच्या मदईचे धडेच बाबा अखंड देत असतात. अगदी तुकाराम महाराजांच्या अभंग बोलातच सांगायचे तर
जोडोनिया धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें बेंच करी ।।
हेच बाबांच्या कीर्तनांचे थोड्यात सार सांगता येईल. वारकरी पंथाने देव देवळे दान दक्षणा ब्राह्मण भोजनादि पोटभरू व्यापारात लोकांच्या श्रद्धाळू भावनांचा जो दुरुपयोग चालवला होता, त्याला गाडगेबाबांच्या कीर्तनानी आता पुष्कळच पायाबंद ठोकला आहे.
जनता संपर्क (मास कॉण्टॅक्ट)
चालू जागतिक उलाढालीत जनता संपर्क हे चळवळींचे नि राजकारण- सिद्धीचे एक जाज्वल्य साधन अथवा शस्त्र झाले आहे. सारे राजकारणी पंच पक्ष या संपर्काच्या सिद्धीसाठी धडपडताहेत. मोठमोठ्या सभा भरतात. लाखोगणति लोक येतात. टाळ्या पिटतात. जयजयकार करतात. तरीहि ही संपर्क-सिद्धी अजून एकाही पंथाला साधलेली नाही. लोकमान्य म्हणून मिरवणाऱ्या काँग्रेस पार्टीचीहि एकच रड ऐकू येते का आम्ही अजूनहि जनता- संपर्कापासून दूरदूरच आहोत. या दुराव्याचे कारण मोलें घातलें रडाया । नाही आसूं आणि माया ।। या तुकोक्तींतच सापडते. मोठमोठे पुढारी सभांत भाषणे करतात. त्यांचा परिणाम काय होतो? नळी फुंकिली सोनारें नि इकडून तिकडे गेले वारें, एवढाच.
थेट खालच्या तळाला रुतून पडलेल्या अनाडी खेडूत जनतेच्या काळजाला गाडगेबाबांचा जिव्हाळा जसा बिनचूक प्रत्यक्ष जाऊन भिडला आहे, तेवढी सिद्धी आजवर कोणीहि मिळवलेली नाही. गाडगेबाबा आले या एका हाकाटीने मागासलेल्या बहुजन समाजांत चद्दिशी उत्साहाची नि उमाळ्याची बिजली सणाणत जाते. श्रीमंतापासून भणंग भिकाऱ्यापर्यंत सगळी दुनिया त्यांच्या नुसत्या दर्शनासाठी आणि ते सांगतील ते करण्यासाठी वाऱ्यासारखी जमा होते. बाबांच्या या लोकसंग्रही जनता-संपर्काचा थोडासा उष्टामाष्टा, घास आपल्याहि पदराला लागावा, यासाठी अनेक विद्यमान राजकारणी पक्षांनी खटपटी केल्या आहेत. पण बाबा पक्के वस्ताद! राजकारणी सौद्याच्या या सोदेगिरीत ते आपल्या परमार्थाला यत्किंचितहि विटाळू इच्छीत नाहीत.
थोड्याच दिवसांपूर्वी पंढरपूर मुक्कामी एका नामवंत `राष्ट्रीय` संत कवीने बाबांना राजकारणी भवितव्याच्या चर्चेत गुरफटण्याचा डाव टाकला. "मी जन्माचा अडाणी. आंगठे बहाद्दर नांगरगट्ट्या. मला हो काय तुमचे हे कसले कारण का फारण म्हणता ते समजणार? गमन नसे ज्या गावीं, तेथील वाट कशास पुसावी?" असा सरळ साफ जबाब देऊन एक मिनिटात वाटेला लावले.
लोकोत्तर पुरुषोत्तम एकटाच असतो
इतिहास निर्माण करणाऱ्या लोकोत्तर पुरुषोत्तमांची परंपरा त्यांच्या मृत्यूबरोबरच मरते, असा इतिहासाचा दाखला आहे. कोणत्याहि राष्ट्रात हाच प्रकार. छत्रपति शिवाजी महाराज! शून्यातून त्यांनी मऱ्हाठी स्वराज्याचे ब्रह्माण्ड निर्माण केले. त्यांच्या मृत्यूबरोबर छत्रपतीच्या छत्राची नि त्या स्वराज्याची वाताहात चालू झाली. पुढचे सारे छत्रपति छत्र्या वापरणारे सामान्य वारसच ठरले ना? थोरल्या बाजीरावानंतर पेशवाईचे काय झाले? लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रसंसाराचे मुंबईच्या बॅकबेवरच जळून कोळसे झाले. ऑन. गोखल्यांच्या मागे काळा लाँग फोट, उपरणे, पगडी आणि भारत सेवक समाजाची खाणावळ तेवढी शिलकी उरली. महात्मा गांधींच्या संप्रदायाचे धिंडवडे आज आपल्या डोळ्यांसमोर चालूच आहेत. संतशिरोमणि तुकारामाच्या मागे टाळ टिळा माळेपेक्षा विशेष काय उरले? रामदासांची देवळे बांधणारांजवळ दासबोधाची चर्पटपंजरी आणि फंडगुडीशिवाय काय माहात्म्य दिसत आहे? भाविक भगतानी चमत्कार- साक्षात्कारांचा मालमसाला भरपूर घालून रंगवलेले भरमसाट नि खोट्यानाट्या तपशिलांचे पुराणवजा इतिहास तेवढे सत्यशोधकांची माथेफोड करायला जिवंत राहिले आहेत.
भूत-वर्तमान-भविष्याचा बिनचूक काटेतोल अंदाज करणाऱ्या गाडगेबाबांना कर्तृत्वाचा लवलेशहि अभिमान नसला, तरी चिंध्या काठी- मडक्याच्या प्रतापाने जागोजाग उभारलेल्या मोठमोठ्या लोकोपयोगी संस्थांचे आणि अनुयायांच्या टोळ्यांचे भविष्य त्यांनी तंतोतंत हेरून ठेवले आहे आणि तशा स्पष्ट सूचना आजूबाजूच्या निःस्पृहपणाने ते नेहमी देतच असतात. शिवाजीच्या अमदानीत खावंद जबरदस्त म्हणूनच हजारो भले, बुरे, शिष्ट अशिष्ट, सज्जन दुर्जन आणि सरळ हेकट एकमार्गी एकसूत्री राष्ट्रकार्याला जुंपले गेले. तोच प्रकार आज गाडगेबाबांच्या गरुडनेत्री कारभारात दिसत आहे.
हनुमान गढीवर उभारलेल्या नाशिकच्या प्रचंड धर्मशाळेकडे पाहून एकदा ते आपल्या अनुयायांना म्हणाले, "हा पसारा कुणी उभा केला? मी का तुम्ही? सरकारने जागा दिली. उदार दात्यांनी धन दिले, कामकऱ्यांनी कष्ट केले. म्हणून हा देखावा दिसतो. आपण काय केलं? काहीहि नाही. कल्पना केली? नुसती कल्पना करून काय झालं असतं? श्रीमंतानी पैसे दिले, कामकऱ्यांनी घाम गाळला, त्यांचे उपकारांचे ओझे आपल्या माथ्यावर चढले. या धर्मशाळेत हजारो लोक येतात, सुखाने राहतात गोरगरिबांना अन्नसत्रात भाकर आमटी मिळते, ते त्या धनदात्याला नि कामकऱ्यांना दुवा देतात. त्यांचा तो आनंद आपण डोळे भरून पहावा, एवढंच आपले सुख नि भाग्य. ज्या निस्संग निर्हेतुक वृत्तीने ही माया जन्माला आली, आज चालू आहे, ती वृत्ति ज्या दिवशी किंचित तिळाएवढीहि डागळली जाईल, त्या दिवशी ही धर्मशाळा त्या टेकाडावरून कोसळून या खालच्या गोदावरी मातेच्या पोटात अखेरचा ठाव घेईल."
या उद्गारांतच बाबांच्या निष्काम कर्मयोगाचे सारे मर्म स्पष्ट उमटलेले दिसते.
अनुयायांविषयीहि त्यांची वृत्ति अशीच निस्संग, निर्मोही नि बेपर्वा असते. मेघ नाही विचारीत हगणदारी आणि शेत या तुकोक्तीप्रमाणे कच्चा सच्चा लुच्चा किंवा हुच्चा कोणीहि असो, सर्वांशी ते पित्याच्या विशाळ प्रेमळ भावानेच वागत असतात. "ज्याचे कर्म त्याच्याबरोबर! माझ्या मार्गाने आणि चाकोरीने चालला तर झालं आहे तेवढं टिकेल काही काळ. नाहीतर अखेर आहेच ठरलेली, व्हायचे आणि जायचे, हा जगाचा नियमच आहे. हसायचं कशाला नि रडायचं तरी कशाला? म्हणा गोविंद राधे गोविंद, जय गोविंद राधे गोविंद."
****
गंगेच्या पाण्याने गंगेची पूजा
अवचित नि अयाचित योगाने गाडगेबाबांचे हे परम पवित्र सगुण चरित्र लिहिण्याची कामगिरी मजवर सोपवण्याची श्री बाबांची लहर लागली. बाबांचे चरित्र महासागरासारखे अफाट नि विशाळ, हकिकतींचे, आठवणींचे नि भक्तजणांकडून आलेल्या नानाविध गोष्टींचे कितीतरी कागदपत्रं माझ्यासमोर उभे. किती घ्यावे नि कोणते टाकावे, समजे ना. गांगरून गेलो मी! प्रथम, तपशीलवार विस्तृत मोठे चरित्र लिहिण्याची योजना. ते काम सावकाशीने चालले असतानाच, एक दिवस बाबांचा निरोप आला
फुलवात तेवत आहे तोंवर तिच्या उजेडात
काय पहायचे ते पाहून घ्यावे. केव्हा वारा
येईल नि ती विझेल, याचा काय नेम?
या निरोपाने मी तर चरकलोच. चला, छोटे तर छोटे. पण माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे वाचकांच्या विचारांना चालना देणारे पुस्तक शक्य तितक्या झटपट लिहून बाहेर काढण्यासाठी बसलो टाईपरायटर खडाडवीत. बाबांच्या शतपैलू चरित्रातील मुख्यमुख्य ठळक पैलू मी येथवर चित्रित केले. इंद्रधनुष्याप्रमाणे चित्ताकर्षक असणाऱ्या शेकडो नवकथांचा समावेश करण्याचा मोह शिकस्तीने टाळावा लागला. एक तर लेखन-मर्यादा आकुंचलेली आणि बाबांच्या निरोपातली ती निरांजनं मला सारखी वाकुल्या दाखवीत सुटली. केली सेवा वाचकांनी गोड मानून घेतली का त्यातच मला आनंद.
अखेर, गंगेच्या पाण्यानें गंगेची पूजा, या न्यायाने ही चरित्र - लेखनाची पत्री श्री गाडगेबाबांच्या चरणा- (अरे हो! पायाना तर ते हातहि लावून देणार नाहीत.) बाबांच्या त्या कामधेनू गाडग्यांत साष्टांग प्रणिपाताने समर्पण करीत आहे. गरिबाची ही शिळीपाकी भाकरी आमटी बाबांनी रुचकर मानून दिलेला समाधानाचा ढेकर कानी पडला म्हणजे आयुष्याचे सार्थक मानणारा-
- केशव सीताराम ठाकरे,
मुंबई- २८
महाशिवरात्र, शके १८७३,
ता. २३ फेब्रुवारी १९५२
****
परिशिष्ट
श्री गाडगेबाबांच्या जीवनातील काही प्रमुख घटना
(यापुढील भाग प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेला नसल्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. मूळ चरित्रात ही भर श्री गाडगे महाराज मिशनच्या वतीने घालण्यात आली असून ती आवश्यक होती. – प्रबोधनकार डॉट कॉम)
मराठीचे निर्भीड लेखक व थोर समाजसुधारक प्रबोधनकार कै. ठाकरे यांनी श्री गाडगेबाबांच्या चरित्रात इ. स. १९५२ पर्यंतच्या घटनांचा उल्लेख आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने फारच उत्कृष्टपणे चितारला आहे. प्रत्येक प्रसंगाचे चित्र वाचकांच्या डोळ्यासमोर साकार करणे हा त्यांच्या लेखनातील महत्त्वाचा गुण आहे. इ.स. १९५२ ते इ.स. १९५६ पर्यंतच्या श्रीबाबांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांच्या धावता आढावा वाचकांच्या माहितीसाठी खाली देत आहोत. प्रबोधनकारांनी कुशलतेने विणलेल्या भरजरी पैठणीवर हे त्रोटक लिखाण म्हणजे `ठिगळ` लावण्याचा प्रकार आहे. वाचक हा प्रयत्न गोड मानून घेतील अशी आशा आहे.
धर्माच्या नांवावर होणाऱ्या हिंसाबंदीचे कार्य भारतात मोठ्या प्रमाणावर श्री गाडगेबाबांनीच केले. महाराष्ट्रात भरणाऱ्या बहुतेक ग्रामीण यात्रेतून देवांच्या नावावर होणारी हिंसा बंद करण्यासाठी आपल्या अनुयायी मंडळींना पाठवून, बाबा सप्ते करण्यास सांगत व आपण प्रत्यक्ष तेथे त्या त्या वेळी जाऊन, आपल्या निर्भीड व सडेतोड वाणीने लोकांना उपदेश करीत. या कार्यात अनेक ठिकाणी जीवावरही बेतले, पण त्याची बाबांनी कधीच पर्वा केली नाही.
अहमदनगर जिल्ह्यात वरवंडी येथे होणारी प्रचंड हिंसाही आपल्या अनुयायी मंडळींसह तेथे अनेकदा जाऊन शेवटी ती बंद केली आणि त्या जागेवर सुंदर विठ्ठल रखुमाई मंदिर बांधले.
हे कार्य हातावेगळे होताच राहुरी येथे त्यांना एक प्रशस्त जागा मिळाली. तेथे काही वर्षे गोरक्षण चालविले. त्या भागात फिरत असतांना तेथील आदिवासी, भिल्ल लोकांचे हाल त्यांना दिसले. अठराविश्वे दारिद्र्याने पिडलेले, शिक्षण व संस्कार नसल्यामुळे पसरलेले घोर अज्ञान व अज्ञानामुळेच व्यसने, देवाच्या नांवावर हिंसा आणि त्यांच्यात आलेला निरुद्योगीपणाही त्यांच्या नजरेतून सुटला नाही, या लोकांना माणसांत आणून सुखी करावयाचे असेल तर त्यांच्या मुलाबाळांच्या फुकट शिक्षणाची सोय करणे हे महत्त्वाचे आहे हे त्यांनी हेरले.
जे मनाला एकदा पटले ते करायचेच
हा बाबांचा खाक्या असल्यामुळे, राहुरी येथे मिळालेल्या जागेवर आदिवासी मुलांमुलींकरिता आश्रमशाळा काढण्याचे ठरले व इ.स. १९५४ साली तिची स्थापना झाली. श्री गाडगे महाराज मिशनच्या शैक्षणिक कार्याला आज जे प्रचंड प्रवाहाचे रूप आले त्याचा ही `आश्रमशाळा` हा उगमच म्हटला पाहिजे. याच वर्षी मुर्तिजापूर येथेही विद्यालयाची सुरुवात श्री बाबांनी करून दिली होतीच. स्वतः बाबा अंगठाबहाद्दर होते. पण गोरगरीब आदिवासींच्या मुलामुलींना शिक्षण मिळावे अशी त्यांना तळमळ होती.
दुसऱ्याचे दुःख पाहिले की ते दूर करावयाचे
हा बाबांचा नेहमी प्रयत्न असे. सर्व भारतातून मुंबईस असाध्य रोगाच्या औषधोपचारासाठी लोक येतात. रोगी दवाखान्यात राहतो. पण सोबतच्या चार दोन माणसांची मुंबईसारख्या शहरात सोय होणे कठीण असते. धनिकांची पैशामुळे कोठेही सोय होते, पण सर्वसाधारण माणसाचे काय?
मुंबईत जे. जे. हॉस्पिटलच्या भागात बाबा नेहमी जात, रस्त्यावर आडोश्याला सामान ठेवून, स्वयंपाक पाणी करणारे रोग्यांचे संबंधित त्यांनी अनेक वेळा पाहिले. त्यावेळी त्यांना कल्पना आली की, या लोकांकरिता जर एखादी धर्मशाळा बांधली तर त्यांच्या सोईच्या दृष्टीने बरे होईल. झाले. बाबांच्या मनात येताच सरकार व जे. जे. ट्रस्टकडून जागा मिळवून त्यावर उदार धनिकांच्या सहकार्याने उत्तम सर्व सोईंनी युक्त अशी धर्मशाळा इ.स. १९५४ साली बांधली.
असा बाबांचा लोकसेवा, लोकशिक्षण व जनजागृतीच्या कार्याचा तडाखा चालू होता. लोकोद्धाराच्या सेवा कार्याची त्यांची तळमळ त्यांना. घडीभरही स्वस्थ बसू देत नव्हती. मन बलवान होते, पण शरीर थकत चालले होते.
मरना भला विदेश जहान अपना कोय
निर्वाणाचे अगोदर वर्ष दोन वर्षांपासून बाबा कीर्तनातून नेहमी सांगत की "जन्मलेला माणूस मरतोच, मलाही आज ना उद्या मरण येणार. मला मरण कोणाच्या घरांत, कोणाच्या दारांत, संस्थेत यावयाला नको, तर ते एकाद्या बेवारशी माणसासारखे रस्त्यावर आले पाहिजे."
"आता जावे लागते. ज्यांनी गाडगे बुवा बघितले नसतील, त्यांची भेट झाली, हीच आता शेवटची भेट." यावरून समजले की, आपली जाण्याची वेळ जवळ आली हे त्यांना कळलेले होते.
दीनदुःखी अशा कुष्ठरोग्याच्या सेवेची बाबांना फार आवड होती. नाशिक येथे कुष्ठधामाच्या उद्घाटनासाठी ते हजर होते. कै. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांना दोन शब्द बोलण्याची विनंती केली. श्रीबाबा म्हणाले, “भाग्यवान तोच की ज्याचे शरीर निरोगी आहे, हे महारोगी दुःखाने पिडलेले अभागी जीव आहेत. भाग्यवानांनी या अभागी जीवांकरिता काही केले पाहिजे. हे कुष्ठधाम तुमचे माना. याला मदत करा. यांत रोग्यांची दुःखे दूर होतील, हाच खरा दान व धर्माचा मार्ग आहे" रंजल्या गांजल्याचे दुःख निवारण कसे होईल हा एकच ध्यास शेवटच्या क्षणापर्यंत बाबांना लागला होता.
महानिर्माणकर्त्याचे महानिर्वाण
शरीर थकले; पण मन मजबूत होते
जून १९५५ मधील अत्यंत चिंतेची घटना म्हणजे श्री बाबांचा आजार. कित्येक महिने आजाराने त्यांच्या प्रकृतीला पछाडले होते. काही डॉक्टरी इलाज करावे, सांगावे, तर तुफानी वावटळीप्रमाणे श्री बाबांच्या दौऱ्यापुढे ते फोल ठरत. कितीही वेदना चालू असल्या, उभे रहाताना पदोपदी शरीराचा तोल जात असला, तरी त्यांचे वावटळी कीर्तनाचे कार्यक्रम अखंड चालूच. क्षणाचीही उसंत नाही, विश्रांती ही चीजच नाही. आज नागपूर जिल्ह्यातल्या एखाद्या खेडेगांवी तर लगेच दुसऱ्या दिवशी पुणे जिल्ह्यातल्या एखाद्या गावी.
तिथले कीर्तन आटोपले की नाशिकला कीर्तनाला उभे. या झंझावाती कार्यक्रमामुळे औषधोपचार होणार कसे? श्री बाबांना त्याची पर्वाच नव्हती. औषधाने काय होणार? ते म्हणतात की इतकी हयात गुजरली. मला औषध ठावे नाही. हवा कशाला तो आजार. माणसाने सारखे काम करत रहावे. काळाची हाक आली तर थोपविण्याची कोणाची प्राज्ञा आहे? बाबांच्या बोलण्यातला हा एक प्रकारे वेदान्तच! पण एकीकडे शारीरिक आजाराच्या वेदना चालू असलेल्या स्पष्ट दिसत असतांनाही त्यांच्यावर मनुष्याला शक्य आणि साध्य ते उपाय न करता बाबांच्या हजारो भक्तांना स्वस्थ तरी बसवणार कसे?
तरी देखील केवळ बाबांच्या भक्तांनी आग्रह करून त्यांना मुंबईत सेंट जॉर्ज हॉस्पिटलांत नेले. हॉस्पिटल म्हटले की तेथे बिछान्याची कॉट वगैरे थाट आलाच. श्री बाबा त्याचा काय मुलाहिजा ठेवणार? दीनदुनियेने निदान फाटक्या कांबळ्यावर तरी रात्री श्रमलेला देह टाकावा, भुकेच्या वेळी कळणा कोंडा तरी सुखात खावा. तहानेसाठी जागोजाग स्वच्छ पाणी मिळावे म्हणून ज्या महात्म्याने आयुष्याची ६० वर वर्षे स्वतः काटाकुट्यात, झाडाझुडपाखाली दगडांच्या उशीवर डोके ठेवून काढली, क्षणभराची निद्राहि घेतली नाही, स्थापन केलेल्या अन्नसत्रांत शेकडो अनाथ दीनदुबळे आमटी-भाकर हुकमी खात असताना, स्वतः दररोज कोणी देईल तो भाकरीचा तुकडा भीक मागून खाल्ला आणि हजारो यात्रेकरू श्री बाबांच्या प्रसादतुल्य धर्मशाळांतून सुरक्षित वास्तव्य करीत असतांना, जो असामान्य पुरुषोत्तम स्वतः दूर कोठेतरी चिखल मातीत झाडाच्या सावलीखाली आरामातला राम शोधण्यांतच मग्न राहिला, तो का हॉस्पिटलांतल्या खाटीवर आरुढ होणार होता!
श्री बाबा चक्क जाऊन जमिनीवर पडले. तेथेच त्यांना उपचार चालू होते. औषधे इंजेक्शने अतिशय मिनतवारीने द्यावी लागत. शेजारी दोन चार निकटवर्ती अनुयायी. ह्या आजारात रोग्याला भरपूर निवांत आणि विश्रांतीची आवश्यकता असते. डॉक्टर नर्सेस तसा सर्वांना वरचेवर इशाराही देत. पण सारे परिणामशून्य! कोणाला मज्जाव करावा तरी पंचाईत. बरे, कोणी आले का बाबा उठून बसत. हात जोडून नमस्कार करीत, एवढ्यावर तर अनुयायांचे व इतरांचे समाधान व्हावे? नाही. काही बाया येत, त्या जवळच रडत बसत. त्यांना हुसकायचे कोणी? कांही जिव्हाळ्याचा विषय निघाला की श्री बाबाच बोलू लागत. कशी मिळणार निवांत विश्रांती!
श्री बाबा ऐंशीच्या घरात होते. देहाची आसक्ती तर त्यांना नव्हतीच. दिवस-रात्रीचा क्षण आणि क्षण जनताजनार्दनाच्या अनेकरूपी सेवेला खर्ची पडावा ही त्यांची साधना, तपस्या. म्हणत असत की लोकांच्या पुण्याईने झाले तेवढे झाले, उद्याचा भरवसा कोणी काय द्यावा? धडा घालून दिला आहे. नीट घटवायचा असेल तर इमानाने घटवा. नाही तर टाका पाटी फोडून. श्री बाबांनी आपला चिमुकला वैयक्तिक संसार टाकला, आणि ते मायाजाळापासून आत्यंतिक निग्रहाने अलिप्त झाले खरे, पण आज त्यांच्या निरिच्छ, निर्माही, निःस्संग आणि निर्लोभी तपस्येतून मोठमोठ्या धर्मशाळा, शाळा, पाठशाळा, अन्नसत्रे, सदावर्ते, पाणपोया, गोवर्धन संस्था, इत्यादि जो महाराष्ट्रव्यापी प्रचंड संसार निर्माण झाला होता, त्याच्या व्यवस्थेचीच त्यांना चिंता असे.
म्हणून एके दिवशी सर्वजण झोपी गेलेले असताना श्री बाबांनी कुणालाही न कळविता हॉस्पिटल सोडले. "दवाखान्याचे जबर बिल कोणी द्यावे म्हणून भिऊन पळून आलो" असे विनोदपूर्ण वाक्य बाबा उच्चारित असत. भगवंतांनी आमचा मुकादमा पुढे ढकलला, केसच्या मुदतवाढीची तारीख मिळाली, असेही श्री बाबा भाविक मंडळींच्या पुढे बोलत असत. यावरून श्री बाबांना आपल्या निर्वाणाचा समय जवळ आलेला आहे याची कल्पना होती, असे दिसून येते. अशाच स्थितीत सतत कार्यरत रहाण्याचा निश्चय करून जी जी कामे करणे जरुरीचे होते, ती लवकरात लवकर आटोपण्याचा सपाटा सुरू केला. दवाखान्यातून निघाल्यानंतर त्यांची प्रकृती जरी चांगली दिसत होती, तरी त्यांच्या प्रकृतीत बराच बदल झाला होता. आजारामुळे जो अशक्तपणा आलेला होता, तो काहीसा भरून निघालेला होता. त्यांची खाण्यापिण्याची इच्छा कमी कमी होत होत गेली. आता आपणाला जावयाचे आहे, या जाणीवेने त्यांनी आपल्या कार्यतत्परतेला जोराची चालना दिली. स्थापन केलेल्या सर्व संस्थांचा चित्रपट डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक संस्थेत शिल्लक राहिलेले आपले शेवटचे काम कोणते याची मनोमन तयारी केली. सर्व संस्थांच्या संचालक मंडळींना भेटून तेथील कामे आटोपून घेण्याचा आदेश त्यांना दिला. त्यांच्यापुढे संस्थेच्या कामात हरकती निर्माण होतील अशी कामे निःसंकोचपणे करून घेण्यास भाग पाडले. याप्रमाणे सन १९५६च्या आषाढीवारीपर्यंत आपला दैनिक कीर्तन कार्यक्रम करीत असतानाच संस्थेची कामेही पूर्ण करून घेतली.
निरांजनाने दिलेला प्रकाश
निरांजन तेवत आहे, तोवर काय पहायचे ते पाहून घ्या. वाऱ्याची झुळूक केव्हा कशी येईल नी वात विझेल ते कोण सांगणार? असा काही वर्षांपूर्वी त्यांनी निर्वाणीचा इशारा आपल्या भक्तजनांना दिला होता. निरांजनाच्या त्या तेवत्या उजेडात कोणी काय पाहिले, काय काय घडे घेतले, हा प्रश्न वेगळा; पण त्या निरांजनाने मात्र स्वतः जळून दीन दारिद्र्यांना, गोरगरिबांना जीवनाच्या अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत कसा प्रकाश दिला हे त्यांच्या नश्वर देहाच्या, पण अमर आत्म्याच्या शेवटच्या काळांतील दैनंदिन जीवनावरून दिसून येईल.
जनजागृतीची अखंड यात्रा
मुंबईचे काही असेल ते आटोपून घ्यावे ह्या हेतूने श्री बाबा दिनांक ६-११-१९५६ रोजी मुंबईस आले. दिनांक ८-११-१९५६ रोजी बांद्रा येथे पोलीस लाईनमध्ये श्री बाबांचे कीर्तन झाले. हेच श्री बाबांचे अखेरचे कीर्तन ठरले. पुढे ते पंढरपुरास गेले.
दिनांक १४-११-१९५६ हा एकादशीचा दिवस, उघाड असल्यामुळे यात्रा फारच भरली होती. धर्मशाळेत पाय ठेवावयास जागा नव्हती. सकाळी ४ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत श्री बाबांनी भाविक भक्तांना जमवून भजन करण्यांत व त्यांना उपदेशामृत पाजण्यांत तब्बल १६ तासांचा काळ सतत उभे राहून मोठ्या आनंदाने घालविला. "गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला" हा भजन गजर आसमंतात दुमदुमत होता. श्री बाबांची अमृतवाणी ऐकण्यात भाविक जनता धर्मशाळेच्या आवारांत जमत होती. जेवढे लोक चौकात मावत, तेवढ्यांना खाली बसवून श्री बाबा त्यांना ठराविक प्रश्न विचारून त्यांची उत्तरे ऐकून घेत व त्यावर दोनचार उपदेशामृताचे घोट पाजून त्यांना जावयास सांगत.
ती मंडळी गेल्यावर नवीन समुदाय आत येई, याप्रमाणे रात्रीचे ८ वाजेपर्यंत चालूच होते. त्या नंतर ते गोरक्षणांत गेले व रात्रौ ९ला कीर्तनाला सुरुवात केली. रात्रौ १२ला कीर्तन आटोपण्यापूर्वी जमलेल्या भाविक मंडळींना हे अखेरचे कीर्तन आहे, यापुढे भेटीचा योग येणार नाही असे सांगून त्यांचा निरोप घेतला. सतत उभे राहिल्यामुळे श्री बाबांना थकवा आला होता. म्हणून कीर्तन आटोपल्यावर थोडी विश्रांती घ्यावी असे श्री बाबांचे मनात होते. पण तेवढ्यात ह.भ.प. कैकाडी महाराजांचा निरोप आला की "येथे जमलेल्या मंडळींना दर्शन द्यावे." कडाक्याच्या थंडीत एवढ्या रात्री बाबा वाळवंटात निघाले.
प्रेमसूत्र दोरी। नेते तिकडे जातो हरी ।। या न्यायाने श्री बाबांना जनता प्रेमाने ओढून नेले. श्री कैकाडी महाराजांचे कीर्तन चालूच होते. श्री बाबा आले असे त्यांनी सांगताच जनसमुदायाला उधाण भरती आली. श्री बाबांचे दर्शनासाठी त्यांचे डोळे व उपदेश ऐकण्यासाठी त्यांचे कान उत्सुक झाले होते. श्री कैकाडी महाराजांनी बऱ्याच उशिरा आपले कीर्तन बंद केले व श्री बाबा कीर्तनास उभे राहिले तेव्हा श्रोत्यांना मोठा आनंद झाला. श्री बाबांनी आपल्या रसाळ वाणीने जनतेला उपदेशामृत पाजले, कारण पंढरपूरात ही शेवटची पर्वणी होती. सर्वांचा निरोप घेताना श्री बाबांनी जाहीरपणे सांगितले की, आता तुमची शेवटची भेट आहे. कोणी पाहिले नसेल, कोणी नाव ऐकले असेल तर हीच भेट.
दूसरे दिवशी सकाळी श्री बाबांनी पंढरपूरच्या जनतेचा निरोप घेतला. बाबा मोटारीत आडवे झाले. दोन दिवसांच्या त्रासामुळे शरीर अस्वस्थ झाले होते. त्यामुळे झोपही येत नव्हती. बघता बघता बाबांना थंडी बाजून सडकून ताप भरला. पुण्यास पोहोचल्याशिवाय औषधोपचार करणे शक्य नव्हते. रात्री ८ वाजता गाडी पुण्यास आली. तेथे रात्रभर औषधापचार केले. श्री बाबांना ताबडतोब मुंबईस घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तेथून मोटारने श्री बाबांना मुंबईस आणले व सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. श्री गाडगेबाबांची तब्येत जास्त आहे व त्यांना दवाखान्यात दाखल केले हे समजताच बाबांच्या दर्शनार्थ भाविक भक्त मंडळींची गर्दी होऊ लागली. दवाखान्यातील इतर रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून २१-११-५६ रोजी रात्रौ १० वाजता त्यांनी दवाखाना सोडला व नामदार तपासेसाहेब यांच्या बंगल्यावर निघून गेले. बंगल्यावरही डॉ. जाल पटेल व डॉ. बजीरानी येऊन औषधोपचार करीत असत.
चार पाच दिवसात आराम वाटताच बाबा वांद्रा येथे श्रीमती रावबाई यांच्या येथे गेले. तेथे दोन दिवस राहून गिरगावांत शेटे साहेब यांच्या निवासस्थानावर आले. तेथून राजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर काही दिवस मुक्काम केला व परत वांद्र्यास ६-१२-५६ रोजी गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निधन झाल्याची बातमी त्यांना तेथे समजली. ‘काही दिवस जगायचे असते, पुष्कळ काम राहिले.` असे म्हणून थोडा वेळ स्तब्ध झाले. नागरवाडीला निघायचं, अमरावतीला जायची तयारी करा असे सोबतच्या मंडळींस सांगितले. वांद्र्याहून बाबा निघाले व गिरगावात शेटे साहेबांकडे थांबून बोरीबंदरवर आले. मुंबई हावडा एक्सप्रेसने बाबा अमरावतीस जात आहेत अशा आशयाच्या तारा नाशिक, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा व अमरावती इत्यादी ठिकाणी पाठवल्या व त्याप्रमाणे प्रत्येक स्टेशनवर श्री बाबांच्या दर्शनास भाविक भक्त मंडळी आली.
त्यांना श्री बाबांनी दर्शन दिले व सर्वांना मोठी धन्यता वाटली. सर्वांचे अंतःकरण मात्र श्री बाबांची प्रकृती पाहून दुःखीच होते. मुंबई सोडण्यापूवी मुंबईकरांनी श्री बाबांना विनंती केली होती की, बाबा तुमची तब्येत चांगली नाही. तुम्ही सध्यातरी मुंबई सोडू नका, परंतु बाबा तोंडातून बाहेर गेलेला शब्द परत घेणारे बाबा नव्हते.
दिनांक ७-१२-१९५६ रोजी सकाळी १०-३० वाजता एक्सप्रेस वडनेर स्टेशनवर आली. अमरावती येथे श्री. गोकुलभाईनी श्री बाबांची व्यवस्था आपल्या बंगल्यावर केली होती. परंतु नवाथे यांच्या रस्त्यावरील बंगल्यावरच श्री बाबांनी आपला पहिला मुक्काम केला. दुसरे दिवशी म्हणजे दिनांक ८-१२-१९५६ रोजी सकाळी श्री बाबा अमरावतीस श्री. गोकुलभाई यांच्या बंगल्यावर गेले. तेथे डॉ. शहा यांचेकडून औषधोपचार सुरू केला. मला आता औषध नको, मी बरा आहे असे श्री बाबा म्हणत, पण भोळे भाबडे भक्त थोडेच गप्प राहाणार होते! दिनांक ९-१२-१९५६ला श्री. राठोड यांच्या बंगल्यावर गेल्यावर तेथे श्री बाबांचे काहीच न जुमानता बंगल्यावर औषधांची सारी व्यवस्था करण्यात आली. श्री बाबांचे अंगात अशक्तपणा होताच.
जेमतेम उठून बसावेसे वाटे, पण अशक्त शरीर त्याना तसे करू देईना. येथेही श्री बाबांच्या दर्शनासाठी गर्दी होऊ लागली. श्री बाबांना विश्रांती मिळेना व डॉक्टर नेहमी सांगत की, श्री बाबांना भरपूर विश्रांती पाहिजे. श्री बाबा म्हणत, "येथे आपण किती दिवस थांबावे?" दर्शनाला आलेल्या मंडळीस सांगत, "तुम्ही आपापल्या गावी जा. मला औषध वगैरे काही नको," डॉ. शहानी पुन्हा प्रकृती तपासून सांगितले की, श्री बाबांना येथे ठेवण्यापेक्षा दवाखान्यात दाखल करणे सोयीचे होईल. पण दवाखान्यात जाण्याची श्री बाबांची इच्छा दिसेना. सर्वांनी फार आग्रह केला. दिनांक १३-१२-१९५६ रोजी दुपारी श्री बाबांची प्रकृती अचानक बिघडली व संध्याकाळी श्री बाबांना हर्दिन इस्पितळात दाखल करण्यात आले. श्री बाबांना न्युमोनिया डायबेटिक कॉमा नावाचा आजार होता. औषधोपचार सुरू झाले. श्री बाबांची नाराजी वाढत होती, तर इकडे दर्शनासाठी गर्दी वाढतच होती. श्री बाबा दोन्ही हात जोडून सर्वांचे दर्शन घेत होते.
श्री. राठोड यांच्या बंगल्यावर आले. तेथून पुन्हा दौऱ्यावर जाण्याचा बेत त्यांनी जाहीर केला. डॉक्टर नर्स वगैरे मंडळी आली. ऑक्सिजनचे सामान सोबतच होते. माझी प्रकृती आता बरी आहे, आता तुम्ही हे सर्व सामान घेऊन जा, अशी त्यांची समजूत करून त्यांना पाठवून दिले, व आपण मोकळे झाले. नंतर सर्व मंडळीना खाली बसवून श्री बाबा उभे राहिले व सर्वांना उपदेश केला व सांगितले, की माझी तब्बेत आता ठीक आहे अशक्तपणा थोडा आहे, मी आता नागरवाडीस जातो, तेथे गोरक्षणांत विश्रांती घेऊन परत येईन. मी आजपर्यंत कधी माझेसाठी वर्गणी करण्यांस सांगितली नाही, पण आता अखेर तुम्हाला सांगितले की, तुम्ही वर्गणी करा. श्री बाबांचे तोंडून वर्गणी करा असे शब्द निघताच मंडळींनी आपल्या ऐपतीप्रमाणे वर्गणी दिली. १५ मिनिटांनी वर्गणी किती जमा झाली हे विचारताच हजार रुपये गोळा झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. तेव्हा त्यांनी वर्गणी बंद करण्याची सूचना केली. त्यापैकी ५०० रु. श्री बाबांनी दवाखान्याचे बिलासाठी, २५० रु. श्री दादास, २५० रु. श्री. नगिनभाई यांच्याजवळ ठेवण्यास सांगितले, नंतर सर्वांना आपल्या गावी जाण्यास मोठ्या आनंदाने सांगितले.
बाबांची यात्रा पुन्हा सुरू झाली. गाडी हळूहळू चालविण्यात येत होती. श्री बाबांची प्रकृती खालावत होती व गाडीतील मंडळींचा जीव खालीवर होत होता. सर्व औषधे परत केली होती. जवळ पाण्याशिवाय कांहीही नव्हते. श्री बाबांना थोडे थोडे पाणी देण्यांत येत होते. अंगातील उष्णतेमुळे श्री बाबांनी अंगावरचे कपडे काढा व शरीर खुले करा अशी सूचना केली. कडक थंडी पडली होती. परंतु श्री बाबांच्या अंगाचा दाह होत होता. रात्री ८.३०चे सुमारास चांदुरबाजार गांव आले. पक्का रोड संपला व पुढे नागरवाडीपर्यंत कच्चा रस्ता आहे असे कळले. श्री बाबा नागरवाडीस जाणार आहेत अशी बातमी चांदुरबाजार निवासी जनतेला व आजूबाजूच्या खेड्यांना आगाऊ कळल्यामुळे सर्व लोक श्री बाबांच्या दर्शनासाठी नागरवाडी रस्त्यावर जमा झाले होते. सर्वांनी श्री बाबांचे दर्शन घेतले. रात्र झाली, बाबा येथेच रहा व सकाळी जा असा आग्रह धरला होता.
सोबतच्या भक्तांच्या जेवणासाठी भाकरी आणा असे श्री बाबांनी म्हटल्याबरोबर गावांतील लोकांनी भाकरी व कालवणाचे आणले. भाकरीचा ढीग जमला. श्री बाबांच्या नेतृत्वाखाली तेथे जमलेली मंडळी पोटभर जेवली. स्वतः मात्र काहीच घेतले नाही.
एका लोकोत्तर जीवनाचा पूर्णविराम!
प्रकृती अत्यवस्थच होती. महाप्रयाणाची घटका जवळ आल्याचे त्यांना दिसत होते. रात्री ११ वाजता श्री बाबांनी चांदुरबाजार सोडण्याचे ठरविले व नागरवाडीस जाण्याचा आग्रह धरला. इतक्या रात्री जाणे बरे नाही असे मंडळी म्हणे, परंतु श्री बाबांनी गाडी बोलावून घेतली, त्यावेळी तेथे सरकारी डॉक्टर होते. त्यांनी सल्ला दिला की, श्री बाबांची प्रकृती नाजूक आहे व रस्ताही खराब आहे. तरी श्री बाबांना नागरवाडीस नेऊ नका. तेथे डॉक्टरी उपचार होऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत डॉक्टरी उपचारांसाठी बाबांना अमरावतीस नेल्यास बरे होईल, असे सांगण्यात आले.
डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे श्री बाबांच्या मनात नागरवाडीस जाण्याचे होते तरी त्यांनी अमरावतीस चला असे सांगितले. गाडी चांदुरबाजारहून रवाना झाली. गाडी भरवेगाने अमरावतीस जात होती. त्यावेळी गाडीचा वेग अदमासे दरताशी ६० ७० मैल असावा; श्री बाबांच्या प्रकृतीत क्षणोक्षणी बदल होत होता. निर्वाणाची वेळ जवळ येत होती. अशाही समयी गाडीतील मंडळींना बाबा भजन करण्याचे सुचवित होते. सर्वांच्या मनात अत्यंत भीतिदायक वातावरण निर्माण झाले होते. "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” हे श्री बाबांचे आवडते भजन सर्वजण करीत असतानाच श्री बाबा सर्वांकडे पहात होते.
श्री बाबांच्या जीवनाची ज्योत मालवत होती, पण जगाला प्रकाश देण्याची दुर्दम्य इच्छा कायम होती. नागरवाडीतील लोक त्यांची आतुरतेने वाट पहात होते. पण स्वर्गातील देवलोकांनाही या महान आत्म्याच्या स्वागताची जणू घाई झाली होती. पेढी नदीच्या वाहत्या प्रवाहाकडे एकदां दृष्टी टाकली. उगम झाल्यापासून तो सागराला मिळेपर्यंत अनेकांचे जीवन फुलविणाऱ्या त्या नदीच्या प्रवाहाप्रमाणेच लाखो लोकांचे जीवन फुलवून श्री बाबांचा जीवनप्रवाह आता संपत आला होता. श्री बाबांना त्याची जाणीव होती; पण खंत अजिबात नव्हती. नजर शांत होती. त्या शांत नजरेने पुनः एकदा त्या नदीकडे पाहिले. डोळे मिटले. शांत झोपी गेल्यासारखे. पण ते कायमचेच.
`बरोबरीच्या भक्तांचे काळीज फाटले. दुःखाचा आक्रोश झाला. पण जणू बाबांचाच आवाज त्यांना ऐकू आला. मूर्खांनो, रडता कसले? व्हा पुढे. कामे पुष्कळ पडलीत. ती पुरी करणार का नाही?
`बाबांना अमरावतीस आणले. बाबांच्या मृत्यूची बातमी विद्युतवेगाने अमरावतीभर व सर्वत्र पसरली. बाबांच्या दर्शनासाठी खेड्यापाड्यांतून बायाबापड्यांचे थवेच्या थवे अमरावतीला येऊन थबकले. सगळी अमरावती माणसांनी नुसती गच्च भरली होती. लोकांच्या डोळ्यांत अश्रू व हृदयात दुःख मावत नव्हते. अमरावतीच्याच काय, पण महाराष्ट्राच्या इतिहासांत एका चिंध्या नेसलेल्या, गाडगेवाल्या एका कफल्लक, पण लोकोत्तर पुरुषाच्या अंत्यदर्शनासाठी इतका अफाट जनसागर जमल्याचे उदाहरण पूर्वी कधी घडले नाही व पुढे घडण्याची फारशी शक्यता नाही.
त्यांचे कार्य हिमालयाइतके उत्तुंग आहे, तर लोकसंग्रह सागरासारखा विशाल! व्यक्तित्व चंद्रासारखे शीतल तर जनसेवेचे काम सूर्याइतके प्रखर! कामाचा वेग वाऱ्यासारखा सुसाट! अशा या पंचमहाभूती थोर महात्म्याचा देह पंचमहाभूतात विलीन झाला, तेव्हा उभा महाराष्ट्र हळहळला! गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला.....
श्री बाबांच्या सामाजिक कार्याचा विस्तार
१) पूर्णा नदीचा घाट बांधून तयार केला. - इ. स. १९०८
२) ऋणमोचनला पहिली धर्मशाळा - इ. स. १९१४
३) चोखामेळा धर्मशाळा, पंढरपूर - इ. स. १९१७
४) मराठा धर्मशाळा, पंढरपूर - इ. स. १९२०
५) अंध, पंगू सदावर्त, पंढरपूर - इ. स. १९२१
६) परीट धर्मशाळा, पंढरपूर - इ. स. १९२५
७) नाशिक धर्मशाळा - इ. स. १९३०
८) आळंदी धर्मशाळा - इ. स. १९३०
९) आळंदी परीट धर्मशाळा - इ. स. १९३०
१०) देहू धर्मशाळा - इ. स. १९३०
११) अंध, पंगू सदावर्त, नाशिक - इ. स. १९३२
१२) दोनद, जि. अकोला, दोन घाट - इ. स. १९३७
१३) आकुल धर्मशाळा, पुणे - इ. स. १९४०
१४) त्र्यंबकेश्वर परीट धर्मशाळा - इ. स. १९४०
१५) त्र्यंबकेश्वर कल्हईवाले धर्मशाळा - इ. स. १९४८
(१६) श्री गाडगे महाराज मिशन स्थापना - इ. स. १९५२
(१७) नागरवाडी गोरक्षण संस्था - इ. स. १९५२
(१८) श्री गाडगे महाराज गोरक्षण, राहुरी - इ.स. १९५३
(१९) मुंबई धर्मशाळा, जे. जे. हॉस्पिटल - इ. स. १९५४
(२०) आश्रमशाळा, राहुरी - इ. स. १९५४
२१) श्री गाडगेबाबा प्रकाशन समिती - इ. स. १९२५
(२२) दादर धर्मशाळा - इ. स. १९८९
श्री गाडगेमहाराज मिशन
६, विद्यार्थी भुवन, त्रिभुवन रोड, मुंबई - ४०० ००४.
सन १९५२ पासून आजतागायत विविध शैक्षणिक कार्य खालीलप्रमाणे :
आश्रमशाळा आदिवासी मुलां-मुलींकरिता
१) श्री गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा, मु. राहुरी, जि. अहमदनगर.
२) श्री गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा, मु. ओतूर, जि. पुणे.
३) श्री गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा, मु. भिवाळी, वज्रेश्वरी, जि. ठाणे.
४) श्री गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा, मु. चालतवाड, जि. ठाणे.
५) श्री गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा, मु. भातसई-वासिंद, जि. ठाणे.
६) श्री गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा, मु. दाभोण, जि. ठाणे.
७) श्री गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा, मु. नागरवाडी, जि. अमरावती.
८) श्री गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा, मु. उमरी, जि. यवतमाळ.
९) श्री गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा, मु. अकोली, जि. यवतमाळ.
१०) श्री गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा, मु. वळण, जि. अहमदनगर.
११) श्री गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा, मु. मुलव्हड, जि. नाशिक.
१२) श्री गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा, मु. वेरवळ, जि. नाशिक.
१३) श्री गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा, मु. ढाकरमल, जि. अमरावती.
१४) श्री गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा, मु. सिताखंडी, जि. नांदेड.
भटक्या व विमोचित जाती मुलां-मुलींकरिता-
१) श्री गाडगे महाराज भटक्या व विमोचित शाळा, मु. गोंदवले, बु. जि. सातारा.
२) श्री गाडगे महाराज भटक्या व विमोचित शाळा, मु. ब्रह्मपुरी, जि. सातारा.
३) श्री गाडगे महाराज भटक्या व विमोचित शाळा, मु. मुरूम-सर्कल, जि. सातारा.
४) श्री गाडगे महाराज भटक्या व विमोचित शाळा, मु. ताथवडा, जि. सातारा.
५) श्री गाडगे महाराज भटक्या व विमोचित शाळा, मु. वरवडी, जि. अहमदनगर.
६) श्री गाडगे महाराज भटक्या व विमोचित शाळा, मु. भानस-हिवरा, जि. अहमदनगर.
७) श्री गाडगे महाराज भटक्या व विमोचित शाळा, मु. जुनगड, जि. वर्धा.
८) श्री गाडगे महाराज भटक्या व विमोचित शाळा, मु. टाकळी काजी, जि. अहमदनगर
****