शनिमाहात्म्य
अर्थात
ग्रहदशेच्या फेऱ्याचा उलगडा
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
पहिल्या आवृत्तीविषयी
|| जय जय रघुवीर समर्थ ||
शनिमाहात्म्य
अर्थात
ग्रहदशेच्या फेऱ्याच्या उलगडा
लेखक
केशव सीताराम ठाकरे
संपादक : प्रबोधन आणि लोकहितवादी
प्रकाशन
बाळ आणि कंपनी
मुंबई नं. १४
किंमत दीड रुपया.
All Rights Reserved by Author
Printed by
M. C. Lele B. A. at Vikram P. Press, Girgaon. Bombay, No. 4
Published by
Messers, Bal & Co. by Prabhakar Gopal Chitre,
10, Miranda’s Chawl, Dadar, Bombay No. 14
पुस्तकें मागविण्याचा पत्ता
बाळ आणि कंपनी
१० मिरांडाची चाळ, दादर, मुंबई नं. १४.
प्रिय वाचक
प्रस्तुतच्या `शनिमाहात्म्य` पुस्तकात कै. गुरुवर्य आगरकरांची नितांत नास्तिक वृत्ती, ज्योतिषी लोकांची आंधळी आणि भेदरट प्रकृती किंवा तात्याजी महिपतीची नैराश्यवाद प्रवर्तक पौराणिक फलश्रुति, यांपैकी एकाही मार्गाचा अवलंब मी केलेला नाही. केवळ एक संसारी, या नात्याने माझ्या प्रत्यक्ष अनुभवाला जे जे आले आणि स्वाध्याय चिंतनाने मी त्यांचा जसा जितका विचार केला, तोच विचारांचा शब्दपट वाचकांपुढे प्रणिपातपूर्वक मी उघडून ठेवीत आहे. प्रत्येक प्रकरण म्हणजे माझ्या विचार व आचार क्रांतीचे एकेक चढ़ती पायरी असल्यामुळे, ‘ग्रहदशेच्या फेऱ्याचा उलगडा’ मी कोणत्या रीतीने केला, ह्याची वाचकांना स्पष्ट कल्पना येईल. शनिमाहात्म्यावर मी विचार करू लागल्या दिवसापासून तो हे पुस्तक लिहून हातावेगळे होईपर्यंत माझ्या वावरलेल्या चित्तवृत्तीला असामान्य शांती, स्थैर्य व धैर्य प्राप्त झाले. माझ्या परिस्थितीतल्या प्रत्येक वाचकास, या पुस्तकाच्या मननपूर्वक वाचनाने, तोच अनुभव येईल, अशी माझी खात्री आहे. केवळ काहीतरी वाचायचे म्हणून हे पुस्तक वाचणारांना, त्यातली आत्मीयत्वाची तिडीक उमगणे शक्य नाही. ज्याला जन्मात कधी ओरखडाचा अनुभव नाही. त्याने दुसऱ्याच्या जखमेची टायली खुशाल करावी!
प्रस्तुत पुस्तकाचे मुद्रण अनेक अडचणीतून तावून सुलाखून झालेले आहे. `शनिमहात्म्या’ला `विक्रम` छापखानाच भेटावा, हा योगसुद्धा विचार करण्यासारखाच आहे. आजपर्यंतच्या माझ्या पुस्तकांची छपाई व उठाव यांच्या मानाने हे पुस्तक बरेच गबाळ दिसेल, पण त्याला माझा नाईलाज आहे. जेथे परिस्थितीने माझी व घरच्या अपत्यांचीही सर्व बाजूंनी हेळसांड व आवाळ केली, तेथे हे पुस्तकरूपी अपत्यसुद्धा गबाळ अवस्थेत बाहेर का पडू नये? माझ्या आश्रयदात्यांचे मजवरील अकृत्रिम प्रेम आणि वाढता विश्वास, प्रतिकूल परिस्थितीच्या अज्ञातवासात जन्मलेल्या या माझ्या अपत्याचा योग्य तो सत्कार करतील, अशी मला आशा आहे.
नाठाळ अपकारकर्त्यापेक्षा स्नेहाळ उपकारकर्त्यांची संख्या मला फार मोठी लाभलेली आहे. ही श्रीहरीचा मजवर मोठा प्रसादच होय. प्रस्तुत पुस्तकाची कल्पना निघाल्यापासून तो ते आज प्रसिद्ध होत अनेक मित्रांनी मला अनेक प्रकारचे सहाय्य दिले. त्या सर्वाच्या चरणी मी आदरपूर्वक माथा ठेवून, माझ्या हृदयस्थ कृतज्ञ भावनांना व्यक्त करीत आहे. विशेषत: गेल्या नऊ महिन्यांच्या माझ्या अज्ञातवासाच्या काळ्याकुट्ट काळात प्रबोधनाच्या हजारो आश्रयदात्यांन मुद्दा क्षेमसमाचार पुसला, मला उत्तेजनाचे संदेश व भेटी दिल्या, आणि कित्येकांनी सांपत्तिक मदत पाठविली, ही जनता-जनार्दनाची कृपादृष्टी माझ्या नेत्रातून आनंदाश्रूंची अखंड वृष्टी पाडीत आहे. देवाची सेवा मजकडून आमरण अव्यंग व अभंग घडो!
महाराष्ट्राचा दासानुदास
केशव सीताराम ठाकरे
अनंतचतुर्दशी, शके १८५०
दादर, ता. २८ सप्टेंबर १९२८
प्रकरण १ ले
प्रास्ताविक विचार
हिंदुस्थानाचा पिंड काव्यमय किया काव्यप्रिय आहे. काव्याशिवाय त्याला पूर्वी काही स्फुरले नाही आणि आताही काही सुचत नाही. काव्य म्हटले की हिंदुस्थानाला एक प्रकारची फुरफुरी येते. तत्वज्ञान, इतिहास, चरित्र, उपदेश काहीही असो, त्याची काव्याच्या मधुर साच्यात मूस ओतल्याशिवाय पूर्वी हिंदुस्थानाला हायसे वाटले नाही, आजही वाटत नाही. हर्ष असो, शोक असो, विषाद असो, अगर शृंगार वीर करुणादि नवरसांपैकी हवा तो रस असो, तो काव्यानेच आजपर्यंत रंगत आलेला आहे. फार काय, पण रोजच्या व्यवहारातला साधा पत्रव्यवहारसुद्धा कविताबद्ध केल्याशिवाय लेखक वाचकाचे समाधान होत नसे, आणि परस्परांच्या भावनांची किंवा विद्वत्तेची परस्परांस साथ पटत नसे.
यामुळे हिंदुस्थानातले सर्व प्राचीन व अगदी अलीकडे शंभर वर्षांपूर्वीपर्यंतचे अर्वाचीन वाड्मय एकजात कविताबद्ध प्रोज ऊर्फ गद्य भाग जवळजवळ नाहीच. त्याला बहिष्कार होता, असे नव्हे; तर लेखकांच्या पद्यमय भावनेच्या शेतात गद्याचे बीज मुळी धरणे शक्य नसे. हासायचे तरी पद्यात आणि रडायचेही पद्यात. उपदेशाला कविता आणि शिव्याशापालाही कविता विषय शास्वीय असो, नटव्या शृंगाराचा असो, नाहीतर टाळकुट्या भक्तीचा असो, जिकडे पहाल तिकडे कविता कविता कविता.
पद्यमय भाव पद्यमय वाणी ।
गद्याची कहाणी कोण ऐके ।।
असाच तो मनु होता. यामुळे हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहास शोधणाराला काव्यांच्या भरमसाट ताटव्यात भटक भटक भटकावे लागते. शंभर ताटव्यांतल्या हजार फुलांचा परामर्ष तो घेईल, तेव्हा कोठे एखाद्या तत्त्वाचा बिंदु सिद्धांत रूपाने त्याला गवसायचा. बोलून चालून ती काव्यसृष्टी न देखे रवि ते देखे कवि. असल्या पद्याळ ब्रह्मदेवांच्या विशाळ विश्वात कोणीही गद्याळ संशोधक भटकू लागला तर तेथील काव्यपरिमळातच मधुकराप्रमाणे गुंगून जायचा. मग कसले संशोधन न कसले निरीक्षण! विशेषतः गोष्ट नीट ध्यानात घेतली पाहिजे की काव्य भरल्या पोटी निपजते. गद्य म्हणजे घोड्याची भरचाय. पोट भरले असो नाहीतर उपाशी असो, घोड्याची भरधाव केव्हाही सुरू, काव्य सुचायला नार टपण्याची ददात तीळमात्र खपायची नाही. पूर्वी हिंदुस्थान म्हणजे समृद्धीची कामधेनू असल्यामुळे येथे गद्यापेक्षा पद्याची पैदास मुबलक झाली. सध्य हिंदुस्थानात पोटाचे बंड भयंकर उद्भवल्यामुळे, पद्याची रुणझुणती नूपुरे अजिबात माजी पडून, सडक सीताराम अशा स्पष्टवाची गद्याचा नगारा सर्वत्र दणदणाट करीत आहे. हाण टिपरी की काढ दणका. त्याला काव्याचा चटकदार नखरा, तालदार गती, डौलदार भाषा आणि पैलूटार विचरा वगैरे दारांची भटक खटक मुळीच मानवत नाही.
उघाडे नयन रम्य उषा हसत आली
या काव्यमय वाणीपेक्षा `उजाडले उठा.` ही सडेतोड भाषा गद्याला मानवते. त्यामुळे वाचकाला किया श्रोत्याला अर्धयोधासाठी अन्वयाची यातायात शब्दकोशाशी माथेफोडे आणि उत्प्रेक्षा अलंकाराच्या सराट्यातली पायपिटी नव्हे विचारपिटी करण्याचा प्रसंग येत नाही..
आमचे पूर्वीचे सर्व वाङ्मय काव्यमय असल्यामुळे टीचभर सिद्धांत त्यावर चार हात उत्प्रेक्षा अलंकारांची भरगच्च सजावट, असा प्रकार फार सांगायचे असते एक आणि कवींच्या कल्पना अनेक. `राजा निजून उठला` ही एक जरी गोष्ट सांगायची असली, तरी उपमेसाठी विश्वासातल्या साऱ्या ग्रहांना आणि चंद्र सूर्याला खाली उतरून, कल्पनेच्या रंगभूमीवर त्यांचे एखादे साग्रसंगीत नाटक नटविल्याशिवाय कवीच्या काव्यवेदनांची खाज कधीच जिरायची नाही. आणि, कवीराज एकदा का उपमांच्या आणि अलंकारांच्या ओघात घसरणीला लागले की इकडे राजा निजून उठून उसका लागून मेला, तरी यांचे `तो कसा निजून उठला` यावरचे प्रवचन बेकाम चालूच.
निरंकुशः कवयः कवीला कशाची अटक नाही. जंगमाला स्थावर बनवून स्थावराला आकाशात गिरक्या मारायला लावणे कवीच्या हातचा मळ कल्पनेच्या कसरतीने आकाशाला सुद्धा जे चहाची बशी बनविणारे, त्या कवींनी माणसाच्या धडावर हत्तीचे मुंडके बसवून, चार हाताचा गणपती निर्माण केला, तर त्यात आश्चर्य कशाचे? तत्त्वज्ञानाचा साधा का सिद्धांत असे ना, किंवा आयुर्वेदातला सर्पदंशावरचा सोपा का उपाय असे ना, त्यावर द्राविडी प्राणायामी कवित्वाची जरतारी झूल चढविल्याशिवाय कवना चैनच पाय नाही. पुरागादि प्रथात आपणास ज्या अशक्य गोष्टी पदोपदी आढळतात, त्याचे कारण हेच. याचा परिणाम मात्र असा होऊन बसला आहे की ते ग्रंथ खरडताना कवीच्या काव्यवेदनांचे जरी समाधान झाले, तरी आजच्या चिकित्साखोर वाचकांच्या निर्भीड भावनेला त्यातला काव्यमय विस्तार सुद्धा शिमगा वाटू लागला आहे.
म्हणजे तत्त्वापरी तत्त्व गेले आणि गद्य प्रवृत्तीला पद्य पाचफळ ठरले. हां गेले हूं गेले हाती धुपाटणे आले. पुराणात किंवा महात्म्य ग्रंथात त्या त्या कवीला एखाद्या मुद्यावर आपल्या श्रोत्या वाचकांचे आत्मप्रबोधन करावयाचे होते की निव्वळ कवित्वाची कंडू शमविण्यासाठी काहीतरी जाडजूड बाड प्रसवायचे होते, याचा तरी थांग लागत नाही. त्यामुळे अडाणी लोक पुराणातील अक्षर न् अक्षर वाजवी सत्य म्हणून शिरसावंद्य मानतात, तर शिक्षित विवेकवादी त्याचा भरमसाट म्हणून धिक्कार करतात. अशी आजची स्थिती आहे. या स्थितीत काही निश्चित सत्यशोधन करावे, निदान त्याचा नमुनेदार मार्ग दाखवावा अशी फार दिवस माझी इच्छा होती आणि त्या दिशेने माझे विचारयंत्र कामही करीत होते. त्याचा परिणाम आज शनिमाहात्म्य-निरूपणात होत आहे.
****
प्रकरण २ रे
शनिमाहात्म्यच का घेतले?
मी शनिमाहात्म्यच हाती का घेतले? प्रश्न व्यक्तीच्या निवडीचा असला, तरी त्याला काही भरीव कारणेही असली पाहिजेत, ग्रंथकाराने किंवा वक्त्याने आपल्या जवळ कसला तरी नवविचार असल्याशिवाय लेखणी उचलू नये आणि तोड उघडू नये, असे मत आहे. शनिमाहात्म्याची पारायणे करणारे लक्षावधी लोक या महाराष्ट्रात आहेत. तितकेच कदाचित टीकाकारही (निंदक) असतील. या निंदक वंदकांच्या विचारात क्रांती घडवून आणण्याजोगा काहीतरी नवविचार माझ्याजवळ असल्याशिवाय मी या लेखनास प्रवृत्त झालो नाही खास. मी शनिमाहात्म्याचा आंधळा वंदक नके आणि आंधळा निंदकही नव्हे. मात्र प्रस्तुत ग्रंथातील विचारसरणीला माझी सध्याची परिस्थिती मूळ कारण झालेली आहे आणि तिच्या कठोर घर्षणातील एका चमकदार ठिणगीने शनिमाहात्म्याविषयी नवविचाराचा प्रफुल्ल दीप माझ्या मनोमंदिरात उजळला. ही गोष्ट प्रथमच सांगून टाकलेली बरी. या दिव्याच्या उजेडाने मला जे जे दिसले व अनुभवाला पटले ते ते प्रिय वाचकांच्या विचारक्रांतीसाठी नमूद करीत आहे.
मी कट्टा दैववादी (फेटॅलिस्ट) नव्हे आणि कच्चा प्रयत्नवादीही नव्हे. मला मी. ज्योतिषशास्त्र अवगत नाही आणि त्यात डोके खुपसण्याचा मी कधी यत्नही केला नाही. पण ज्योतिषशास्त्रात प्रवीण आणि स्वाध्यायशील असे माझे अनेक स्नेही आहेत आणि ते आपलेपणाच्या शुद्ध कळवळ्याने माझ्या कुंडलीचा अभ्यास करून, माझ्या चळवळीच्या भरती ओहोटीचे ठोकताळे अजमावीत असतात. कधी एखाद्या संकटाची आगामी सूचना देतात, तर कधी देत नाहीत, नुसते आखाडेच अजमावतात. या मित्रांच्या मताप्रमाणे सध्या माझ्यावर शनीची साडेसाती चालू असून गेल्या चार साडेचार वर्षांत माझ्या चरित्रात पडलेल्या क्रांत्या तिचेच परिणाम होत. प्रयत्नांची कितीही शिकस्त केली, धोरणांचे कितीही व्यावहारिक पाचपेच लढविले आणि सबझूट मानून कर्तव्याच्या दिशेने कितीही डुक्करमुसंड्या मारल्या, तरी साडेसातीची मुदत पूर्ण भरल्याशिवाय कोणत्याही कार्याला यश येणार नाही, ते तडीला जाणार नाही, हवे ते उत्पाद पडतील, नसतील ती संकटे उद्भवतील.
मित्र शत्रू बनतील, काय वाटेल ते होईल. आलेल्या किंवा येणाऱ्या संकटांच्या उत्पत्ती स्थिती लयाला व्यावहारिक काहीही कारणे घडली, तरी तो सारा साडेसातीचाच परिणाम. हातात सोने धरले तरी त्याची हटकून माती व्हायची. शनीच्या या साडेसातीच्या चक्रातून एकही माणूस आजपर्यंत निसटू शकला नाही. माणसेच काय, पण संस्था, गावे, राष्ट्रे यांनाही राहू शनि मंगळादिकांची ग्रहदशा यथाक्रम यथाकाळ भोवल्याशिवाय चुकत नाही आणि त्यांनी ती भोगल्याशिवाय सुटका नाही, असे माझे ज्योतिषी मित्रच म्हणतात असे नव्हे, तर सर्व धंदेवाज ज्योतिष्यांचेही असेच म्हणणे आहे. म्हणजे याचा असा सरळ अर्थ निघतो की, आम्ही माणसे आणि आमची ही पृथ्वी ह्या आकाशस्थ डझनभर ग्रहांचे खाद्य, अथवा ह्या ग्रहरूपी मांजरांच्या तडाक्यात सापडलेले उंदीरच होत. उंदराचा जीव घेण्यापूर्वी मांजर जसे त्याच्याशी खेळते बागडते, त्याला थोडे मोकळे सोडून पळू देते आणि चटकन् पुन्हा पंजा मारून पकडते व उलटसुलट आदळते, तेवढेच आणि तितकेच स्वातंत्र्य आम्हा मानवांना आहे. या पलीकडे आमच्या हातात काही सत्ता नाही, शक्ति नाही, बुद्धी नाही, पुरुषार्थ नाही, काही नाही! केवळ शेणामेणाचे गोळे! आकाशस्थ ग्रह त्या गोळ्यांचा देव बनवोत वा माकड करोत, आमच्या हातात प्रतिकाराची कसलीही शक्ती नाही.
असल्या कल्पनेचा अगर भावनेचा प्लेग आज हिंदुस्थानात जितका जास्त फैलावलेला आहे, तितका जगाच्या पाठीवर इतरत्र दिसून येत नाही, ह्या भावनेमुळे कोट्यवधी हिंदी लोकांचे संघ बडवलेल्या बैलाप्रमाणे हव्या त्या परिस्थितीच्या जोखडाखाली बिनतक्रार मान देण्याइतके निष्क्रीय आणि अचेतन होऊन बसले आहेत. प्रतिकाराची धमकच ठार मेल्यामुळे, हिंदुस्थानचे स्वातंत्र्य भस्मसात् होऊन, आज हा अफाट भरतखंड परक्यांचा अक्षरशः गुलाम होऊन पडला आहे. परार्थ तर राहूद्याच, पण स्वार्थासाठी सुद्धा स्वतःचे अंग खरचटून घ्यायला जेथे कोणी तयार नाही, तेथे समाजासाठी, धर्मासाठी किंवा देशासाठी प्राण द्यायला कोण तयार होणार? वाटेल त्या बेमाणुसकीच्या परिस्थितीपुढे अथवा अपमानापुढे हिंदी लोक बिनशर्त मान बाकवितात, याचे कारण प्रचलित ज्योतिषशास्त्राने अगर ज्योतिष्यांनी फैलावलेल्या उपरोक्त भावनेतच आढळते.
बरे, ज्योतिष्यांना टीकेच्या रिंगणावर धरावे तर ते म्हणतात की, आमच्या हातात शास्त्राशिवाय दुसरा आधार नाही. आम्ही भविष्य वर्तवतो म्हणून आम्ही काही देवदूत किंवा मोठे त्रिकलज्ञ द्रष्टे नव्हेत. ज्योतिष हे एक सिद्ध शास्त्र आहे आणि केवळ गणिती आडाख्याने ग्रहांच्या गति विचारात घेऊन, त्यांचे परिणाम ते कथन करते. ह्यात आश्चर्य नाही, चमत्कार नाही किंवा अनुमान नाही. सारा गणिताचा गणिती प्रकार. १४ आणि ५ जसे १९ व्हायचे, २० व्हायचे नाहीत, का १८ व्हायचे नाहीत, तद्वत् ह्या शास्त्राचे ठोकताळे आहेत. प्रत्येक ग्रहाच्या दशेचे गुणधर्म विद्वान संशोधकांनी फार प्राचीन काळी निश्चित शोधनाने आणि अनुभवाने ठरविले आहेत आणि त्याचे पडताळे दररोज प्रत्यक्ष अनुभवाला येत आहेत. शनीची साडेसाती काय, राहूची महादशा काय, किंवा गुरूची महाकृपा काय, त्यांचे येणे जाणे त्यांच्या किंवा कोणाच्याही लहरीवर किंवा काही अपघाता (अॅक्सिडंट)वर अवलंबून नाही.
शनिग्रह महाक्रूर असो, नाहीतर महाबावळट असो; गुरू हा `जंटलमन ऑफ धी फर्स्ट रँक` असो, नाहीतर बाबू चष्मेवाल्याचा दिलदार दोस्त असो; घरी करमत नाही म्हणून हवी ती शाळा तपासण्यास जाणाऱ्या मुंबईच्या सन्मान्य म्युनिसिपल व्हिजिटरांप्रमाणे, बारा ग्रहांपैकी एकाही महात्म्याला हवी तेव्हा `सरप्राइज व्हिजिट` (अचंबा भेट) देता येत नाही. त्यांच्याही भेटीगाठी गणिती एटकावर जखडलेल्या आहेत. प्रत्येक मनुष्याच्या जन्मकाळी आकाशात जी ग्रहस्थिति असेल, ती कागदावर खगोलज्ञ ज्योतिषी मांडतात. ती ग्रहस्थिति म्हणजे मनुष्याचा पिंड आणि जन्मकाळापासून तो मरणकाळापर्यंत ब्रह्मांडात सर्व ग्रहांची जसजशी गति होत जाते, तसतशी त्या मनुष्याच्या पिंडावर त्यांची बरीवाईट स्थिती उमटत असते. ग्रहदशेचा फेरा ह्यात कसलाही वाईट अर्थ नसून, ग्रह जसजसे सूर्याभोवती आपापल्या ठराविक मार्गानि व ठराविक गतीने फिरत असतात, त्या गतीची ऊर्फ फेऱ्याची दशा, म्हणजे परिणाम. Influence of the Planets while on their orbits. ब्रह्मांडात सर्व ग्रहांचे परिभ्रमण घड्याळातील यंत्ररचनेप्रमाणे अखंड चालूच आहे आणि प्रत्येक मनुष्याच्या जन्मकुंडलीतील ग्रहस्थितिप्रमाणे त्या परिभ्रमणाचे परिणाम त्याच्यावर ठराविक काली घडत असतात, घडलेच पाहिजेत; त्यात अणुरेणू इतकीही तफावत पडायची नाही. सगळा गणिती ठोकताळा.
मनुष्य जन्माला आला की त्या क्षणी निरनिराळे ग्रह आपापल्या परिभ्रमणात कोठेकोठे असतात, त्यांचा ज्योतिषी लोक एक नकाशा काढतात. हा नकाशा म्हणजे त्या मनुष्याची कुंडली. कुंडलीत ग्रह ज्या ज्या ठिकाणी असतील, त्या त्या स्थानमाहात्म्याप्रमाणे त्या मनुष्याची जन्मप्रकृती अथवा त्याचा पिंड बनतो. पुढे त्याच्या सर्व आयुष्यक्रमात, अखिल विश्वातल्या परिभ्रमणाप्रमाणे ग्रहांच्या ज्या हालचाली होतात, त्यांचा त्या पिंडावर बरावाईट परिणाम आपोआप घडत असतो. याला आपण असे एक उदाहरण घेऊ. एका खोलीत रामा, कृष्णा आणि गोविंदा असे तिघेजण अनुक्रमे पांढरा, निळा आणि पिवळा अशा तीन रंगांचे सदरे घालून बसले आहेत. खोलीला एकच खिडकी असून, बाहेर कडक सूर्यप्रकाश पडला आहे. जोवर निर्भेळ सूर्यप्रकाश खोलीत येतो तोवर तिघांचे कपडे पांढरे निळे आणि पिवळेच दिसतात. इतक्यात खिडकीवर तांबडे तावदान धरले, तर काय होईल?
तोच पूर्वीचा पांढरा स्वच्छ सूर्यप्रकाश तांबड्या काचेतून खोलीत आल्यामुळे, रामा तांबडा, कृष्णा जांभळा आणि गोविंद नारिंगी कपड्याचे दिसतील. निळी काच लाविली तर कृष्णाच्या निळ्या कपड्यावर काही परिणाम होणार नाही. पण पांढऱ्या कपड्याचा रामा निळा दिसेल, आणि पिवळा गोविंदा हिरवा चार पडेल. पिवळी काच आड घरली, तर गोविंदा मात्र पिवळाच पिवळा राहून, पांढरा रामा पिवळा बनेल आणि निळा कृष्णा हिरवा होईल. तद्वत् सूर्याचा प्रकाश सर्व विश्वाला जरी चैतन्य देत असला, तरी त्या प्रकाशाच्या मार्गात निरनिराळ्या ग्रहांचे येणे जाणे अखंड चालू असल्यामुळे, त्या त्या ग्रहांच्या दशा (Influence) निरनिराळ्या कुंडल्यांच्या व्यक्तीवर यथाक्रम यथाकाळ बरावाईट परिणाम करीत असतात.
ज्योतिषांचे हे म्हणणे खरे मानले तरीही त्यावर आक्षेप असा येतो की मांडलेल्या कुंडल्या खऱ्या कशावरून? एक गृहातला ग्रह दुसऱ्या गृहात चुकून मांडला, तर त्या मनुष्याच्या प्रकृतीच्या तपशीलात भयंकर तफावत पडणे शक्य आहे, आणि जोवर मनुष्य चुकीला पात्रच असतो, साध्या हिशोबात सुद्धा `हातचा आणि एक` घरायला विसरतो आणि जोवर ज्योतिषी हे मनुष्यच आहेत, तोवर त्यांनी तयार केलेल्या कागदी कुंडल्यावर आम्ही विश्वास का ठेवावा? मुळीच ठेवू नये. मला वाटते विश्वविधात्याला ह्या आमच्या आक्षेपाची आगाऊच अटकळ असल्यामुळे, त्याने आमच्या तळहातावर आमची कुंडली आधीच खोदून ठेवलेली असते कागदी तपशिलात चुकले, पण ही तळहाती कुंडली कधीच चुकायची नाही. यामुळे ज्योतिषशास्त्राच्या जोडीनेच हस्तरेषाशास्त्राचीही बरीच प्रगती झालेली आहे.
गेल्या फेब्रुवारी महिन्यात अवचित एके दिवशी मला अगदीच अपरिचित व कधीही न भेटलेले असे ठाण्याचे श्री. वसंत जयवंत चित्रे नावाचे एक तरुण पामिस्ट (हस्तरेषापरीक्षक) भेटले. त्यांनी माझा हात पाहून आयुष्यातील ठळक ठळक प्रसंग तर मुदतशीर सांगितलेच, पण विशेष आश्चर्याची गोष्ट की, माझे वय, जन्मस्थिती, जन्मवार, सायन व निरयन कुंडल्यातील ग्रहस्थाने, राशी, वगैरे तपशील बिनचूक फटाफट अवघ्या नऊ दहा मिनिटांत सांगितला. ज्या कित्येक गोष्टी फक्त माझ्या मलाच माहीत, त्यासुद्धा त्यांनी सूचनांच्या रूपाने दर्शविल्यामुळे मी या तरुणाच्या हस्तरेषापरीक्षण प्राविण्याने अगदी चकित झालो.
या प्रसंगामुळे माझी बरीच एक शंका आपोआप सुटली. आचार्य होऊन शुद्ध वैदिक विधीने मी विवाहविधी चालवीत असतो, हे सर्वश्रुतच आहे. त्या विधीतील पाणिग्रहण विधी प्रथम मी जेव्हा अभ्यासला, तेव्हा शेकहॅन्डची पद्धत वरवर विचार करणारांना जरी युरोपियन वाटली, तरी ती वेदकाळाइतकी प्राचीन आणि खास आर्यन आहे, हा एक सिद्धांत सुटला. ह्या नंतर शंका आली की परस्पर वंदनाचे काम जर दुरून जोडलेल्या दोन हाताच्या नमस्काराने भागते, तर त्यासाठी हा शेकहॅण्डचा घसळामुसळी मामला कशाला पत्करावा? त्यात विशेष काय आहे? दुसरी एक शंका अशी की
जोशी पंचांग पाहाता । मग का बालविधवा होती? ।।
वधुवरांची लग्ने जुळविताना त्यांच्या परस्पर संमतीपेक्षा आणि मने जुळविण्यापेक्षा, त्यांच्या कुंडल्यांच्या जुळवाजुळवीचा आणि खुलवाखुलवीचा एवढा द्राविडी प्राणायामी धुडगूस चालतो का? `कुंडल्या जुळवितात` म्हणजे हे धुडघुशे करतात काय? पण प्रत्येक व्यक्तीची कुंडली, प्रकृती, अथवा पिंड त्याच्या तळहातावरच परमेश्वराने खोदून ठेवलेला असल्यामुळे ज्या वेळी वधू आणि वर पाणिग्रहणासाठी अग्निसाक्षिक आपापले हात एकमेकात, तळहाताला तळहात चिकटवून, घट्ट धरतात, त्याच वेळी त्यांच्या परस्पर प्रकृतीचे, ग्रहदशेचे आणि पिंडाचे खरे सम्मीलन ऊर्फ एकीकरण होत असते.
दोन मित्र परस्परांशी शेकहँड करतात, तेव्हाही हीच भावना त्यात प्रधान असते. नुसत्या कागदी कुंडल्यांची जुळवाजुळव हा ह्याच भावनेचा भ्रष्ट असा एक आंधळ्या रूढीचा प्रकार शिल्लक राहिलेला दिसतो. `परस्परांच्या प्रकृत्या आणि ग्रहस्थिति कशाही असोत, एकमेकांच्या आकर्षणाने अथवा परिस्थितीच्या प्रवाहाने ज्या अर्थी आपण एकमेकांशी वर-वधूच्या नात्याने संयुक्त होण्यासाठी सिद्ध झालो आहो, त्या अर्थी ह्या पाणिग्रहणाने आपले परस्पर पिंड, प्रकृती ग्रहदशेसह एकजिनसी एकपिंडी होवोत.` हाच पाणिग्रहणविधिचा मुख्य हेतू आहे; आणि दोन मित्रांच्या शेकहँडमध्येसुद्धा हेच अविच्छिन्न एकीकरणाचे रहस्य आहे. परंतु शेकडा ९८-९९ लोक परमेश्वरलिखित तळहात-कुंडलीचा मुळीच विचार न करता कागदी कुंडल्यावर डोकी फोडीत बसतात. याचेच नाव हिंदू लोकांचा हिंदूपणा.
कुंडल्या कागदी असोत, नाही तर तळहाती असोत, त्यात चितारलेल्या प्रारब्ध-मर्यादेबाहेर मनुष्याला केव्हाही जाता येणार नाहीं, त्यातील भोक्तृत्व भोगल्याशिवाय सुटका नाही, हा प्रवाद जर खरा मानला तर मनुष्याच्या पुरुषार्थाला बाब तरी राहिला कोठे? सगळाच जर दैववाद, तर यत्नवाद हा शब्द जन्माला तरी कधी? आणि का? आणि कोणाच्या पोटी! बरे, प्रत्येकाचे दैव आणि सुखदुःखाचे फेरे हे जर घड्याळातल्या यंत्राप्रमाणे ठाकठीक ठरलेले आणि यथाकाल यथाक्रम घडणारे, तर त्यासाठी माणसाने आपले हातपाय तरी का हालवावे? दु:ख येणार तर ते अगत्य येणारच येणार आणि सुखाचा मुसळधार पाऊस अमुक वेळी कोसळणार म्हणजे धो धो कोसळणारच असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी! मला हातपाय हलविण्याची जरूर काय? दैववाद्यांचे विचार जवळजवळ असेच असतात.
नवल वाटते ते हेच की ह्या कपाळवाद्यांनासुद्धा आढ्याला तंगड्या लावून स्वस्थ मात्र बसवत नाही. त्यांची काही ना काही धडपड चाललेलीच असते. ज्योतिषबुवाने शनीची साडेसाती वर्तवली की या कपाळवाद्यांनी दर शनिवारी मारुतीला शेंदूर थापून तात्याजी महिपती कृत शनिमाहात्म्याचे पारायण नेटाने चालविलेच, कशाचाही कधी विचार करायचे नाहीत. मारुती शेंदूर, प्रदक्षिणा, तैलाभिषेक, भटपूजा आणि शनिमाहात्म्य यातच साऱ्या अकलेचा आणि हिमतीचा होम. आज शेकडो वर्षे लक्षावधी दैववादी हिंदू या शनिमाहात्म्याच्या पारायणाने शनीच्या साडेसातीला तोंड देण्याचा चंग बांधीत असतात. असा हा ग्रंथ तरी काय आहे, याचे सत्यशोधन करण्यासाठी, पुढील प्रकरणाच्या उंबरठ्यात वाचकांनी पाऊल ठेवावे.
****
प्रकरण ३ रे
विक्रमाच्या साडेसातीची कहाणी (पूर्वार्ध)
शनि आणि साडेसाती या भानगडी काय आहेत, ह्याचा विवेकवादाला धरून विचार करण्यापूर्वी, केवळ महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या मराठी ओवीबद्ध शनिमाहात्म्याचा संशोधनपूर्वक विचार करू. सुप्रसिद्ध संतचरित्रकार तात्या महिपती यांनी `गुर्जर भाषेची कथा`, `अर्थविषयी न्यूनता` न ठेविता, महाराष्ट्रभाषेत `यथामति वर्णिली तत्त्वता` अशी आहे. हा माहात्म्य ग्रंथाला कसल्याही प्राचीर संस्कृत ग्रंथाचा पाया अगर आधार तर नाहीच, पण विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे गुजराती भाषेत शनिमाहात्म्याचा पत्ता नाही. तात्याजी महिपती आत्मविश्वासाने म्हणतो की, `हा ग्रंथ करिता श्रवण । सकळ विघ्ने जाती निरसून । ग्रहपीडा अति दारुण। न बाधे कदा कल्पान्ती ।।` असल्या ह्या पराक्रमी ओवीबद्ध ग्रंथात उज्जनीच्या विक्रमाची कथा काय वर्णन केलेली आहे, ती थोडक्यात नमूद करतो.
कोणे एके काळी (प्रत्येक कथेची सुरुवात याच पालुपदाने करण्याचा संप्रदाय दिसतो. कोणे एके काळी उज्जनीचा विक्रमराजा एका सकाळी आपल्या दरबारात पंडितांची चर्चा चालू असता?) (विक्रमादित्य ही `केसर-इ-हिंद’ पदवीप्रमाणे उज्जनीच्या चक्रवर्ती राजांची पदवी असे. चार-पाच विक्रमादित्य इतिहासात दिसतात. त्यात शनीच्या तडाख्यात सापडलेला विक्रम कोणता, हा वादग्रस्त प्रश्न आहे. विक्रमशक नावाचा एक शक चालू आहे, पण त्याच्याही कुळामुळाचा पत्ता लागलेला नाही.) नवग्रहात श्रेष्ठ कोण? असा वाद माजला. प्रत्येक पंडिताने आपापल्या परीने रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, राहू, केतू या आठ ग्रहांचे बरे वाईट पराक्रम वर्णन केले. नवव्या पंडिताने शनीचे पराक्रम येणे प्रमाणे सांगितले-
ज्यावर तो कोपासि चढे । तयावरी नाना विघ्न ये रोकडे ।
तयाचा संसार बिघडे। न राहे कल्पांती।।
शनिदेव महाक्रोधी । ज्याचा पराजय नोहे युद्धीं ।
देवदानवा त्रिशुद्धी | दुःखदाता शनिदेव ।।
त्याची दृष्टी पडे जयावर । करी तयाचा चकणाचूर ।
अथवा कृपा करी जयावर । तयासि सर्व आनंद प्राप्त होय ।।
शनीच्या पराक्रमाचा दाखला म्हणून ह्या पंडिताने तीन उदाहरणे दिली. शनि जन्माला आला तेव्हा (१) पित्यावर म्हणजे सूर्यावर नजर पडताच त्याच्या सर्वांगावर कुष्ठ भरले, (२) सूर्याचा सारथी अरुण पांगळा झाला, आणि (३) त्याच्या रथाच्या घोड्याचे डोळे फुटले, पुष्कळ उपाय केले, पण गुण येईना अखेर शनीनेच जेव्हा मेहरबानी केली, तेव्हा हे तीनही प्रकार नष्ट झाले.
(तरीही सूर्यस्तोत्रात `असे सारथी पांगुळा ज्या रथासी । नमस्कार त्या सूर्यनारायणासी ।।` हा सिद्धांत कायमचा आहे.)
हे शनीचे वर्णन ऐकून विक्रम राजा खदाखदा हासून म्हणाला की असला कसला हा बापाच्या बोकांडी बसणारा पोरगा! ज्याने जन्म घेताच एवढा पराक्रम केला तो पुढे काय दिवे लावणार झाले. राजाने केलेली ही टवाळी शनीला चटकन कळली आणि तो ताडकन विमानात बसून त्याच दरबारात आला. शनिदेव आले, शनिदेव आले, म्हणून मोठी चांदल उडाली. राजा विक्रमाने उठून शनीला साष्टांग प्रणिपात घातला, पण शनीने त्याचा धि:कार केला शनि म्हणजे त्यावेळी भडकलेली प्रायमस स्टोव! त्याने टवाळीबद्दल राजा विक्रमाला सज्जड दम भरला की शहाण्या, माझी थट्टा करतोस काय! थांब, मीच आता तुझ्या कन्याराशीच्या साडेसातीला येतो.
(अनेक विक्रमादित्यापैकी कन्यारासवाला विक्रम कोणता, हे जरी इतिहास संशोधकांनी हुडकून काढले, तरी साडेसातीवाल्या शनिनिंदक विक्रमराजाचा पत्ता लागणे अशक्य दिसते. का सारेच विक्रमराजे कन्यारासवाले?)
पहा मग ह्या शनीचा इंगा! विक्रमराजाने पुष्कळ विनवण्या केल्या, पण शनि ऐकेना. तो साडेसातीची धमकी देऊन, आला तसा तडक परत घरी गेला. विक्रमही भेदरला. `जे जे पुढे होणार । बुद्धी सुचे तदनुसार । जे असेल लिखिताक्षर । तैसे होईल ।।` एवढ्या वेदांतावर तोही चिंतामग्न अवस्थेत `पुढे काय होणार` याची मार्गप्रतीक्षा करीत बसला. तुमच्या आमच्यासारख्या साध्यासुध्या माणसाला कुडबुड्या जोशाने वर्तवलेली साडेसातीची पाळी आळ्याचा घाम माळ्याला नेते; आणि ही तर खुद्द शनीने समक्ष येऊन दिलेली खास चमकी! तेव्हा विक्रमराजाची काय तिरपीट उडाली असेल, याची कल्पनाच करावी.
राजे लोकांवर आपत्तीचा फास पडला की त्यांना पोखरून खाण्यासाठी मदतनिसांचा, हितचिंतकांचा, सल्लागारांचा, ज्योतिषांचा, मांत्रिकांचा मोठा अफाट घोळका सभोवती जमत असतो. त्यात पहिला नंबर भटाब्राह्मणांचा. साडेसाती वर्णविणारे त्रिकालज्ञ भटच आणि तिचा फेरा परतविणारे तांत्रिक मांत्रिकही भटच.
अगदी प्राचीन काळच्या अयोध्येच्या दशरथ राजापासून तो थेट चालू काळच्या रंगेल रसूल तुकोजीराव होळकरापर्यंत, कोणचाही दरबार घ्या. छावणी घ्या. नाहीतर अंतःपुर घ्या, सर्वत्र भटांचा सुळसुळाट. बऱ्याला भट, वाईटालाही भटच. उलट सल्ला भटाचा आणि सुलट सल्लाही भटाचाच. शनीची साडेसाती जरी साडेसात वर्षांची असते. तरी भटांची पावणेआठी हिंदुस्थानातल्या प्रत्येक हिंदू राजाच्या सिंहासनाच्या पिंडाला जी एकदा अतिप्राचीन काळी झोंबली आहे, ती काही केल्या सुटत नाही. हिंदू राज्याचे सिंहासन म्हणजे भटाळलेल्या पावणेआठ प्राण्यांचा वारसा, असे म्हटले तरी चालेल.
आपत्तीत सापडलेल्या राजाला ही भटसेना एकदा का उपायावर उपाय सुचवू लागली, की प्रत्येकाचा कानमंत्र निराळा, एक म्हणतो असे करावे, दुसरा म्हणतो तसे करावे. शंभराचे शंभर सल्ले, सर्वांचे सल्ले एकदा का या संकटग्रस्त राजावर हल्ले चढवून स्वार्थाचे डल्ले हबकू लागले की वैतागून जाऊन तो `अडला नारायण` अखेर `गाढवाचे पाय धरतो.` याची उदाहरणे आज आपल्या नजरेसमोर प्रत्यक्ष घडत आहेत. ब्राह्मणी भटांच्या किंवा ब्राह्मणेतरी भटाच्या पायांवर कपाळे घासून आपल्या फुटक्या दैवाचे सांधे सांधले न जाता उलट तणावतात आणि त्यांच्या `पवित्र` मसलतीने आजपर्यंत अनेक शहाणे राजे नरातले नारायण असताही अखेर या गाढवांचे पाय धरून प्रत्यक्ष गाढव बनतात, तरीही भटांची पायचाटी करण्याचा गाढवपणा बऱ्याच पदधारी व पदच्युत हिंदु राजांना अजून सुटत नाही, या भटी पावणेआठचे माहात्म्य लिहिणारा तात्याजी महिपति कधी अवतरणार कोण जाणे!
विक्रमाच्या कन्याराशीला शनीच्या साडेसातीचे ग्रहण लागणार, म्हणून सर्व भटपंडत अपायावर उपाय सुचवू लागले. जपजाप्यापलीकडे भटांची अक्कल थोडीच जाणार! त्यांच्या सर्वस्वाचे मूळ तेथेच त्यांनी ताबडतोब शनीच्या महापूजेचा आणि जपजाप्याचा एक लोकमान्य तोडगा सुचविला आणि विशेष आग्रहाने सांगितले की,
मग जपकर्त्या ब्राह्मणाशी । शनैश्वररूप मानूनि त्यासी ।
दक्षिणा देऊनि पुजेसि । प्रसन्नचि करावे ।।
पण या उपायाने फार झाले तर जपकर्त्या रामभटाची एकट्याची तुंबडी भरेल. सर्व वेदशास्त्रसंपन्नांची पोळी पिकणार नाही. म्हणून
मग करावे ब्राह्मणभोजन। यथाशक्ति द्यावे दान ।
ब्राह्मण तृप्त होता पूर्ण । संतोष पावे शनिदेव ।।
अशी पुरवणी जोडण्यात आली. ब्राह्मण पूर्ण तृप्त झाला की शनीचा कोप वितळलाच पाहिजे, असे हे खटकेबाज एटक विक्रमापुढे ब्राह्मणांनी मांडले. `पंडित म्हणता राया समर्था गोष्टी एवढी ऐकावी.` पण विक्रमराजा फारसा भटाळलेला नव्हता. तो सध्या जरी दैवाळला होता, तरी देवाविषयीचा त्याचा विवेक मुळीच मंजूर नव्हता.
राजा म्हणे पंडिताला । शनी न मानीच आम्हाला ।
माता पिता वाहिला । रक्षि तोचि पैं जाणा ।।
`अहो ब्राह्मण हो, या तुमच्या जपजाप्याने काय होणार? शनिदेव मला छळल्याशिवाय सोडणार नाही. तो थोडाच तुम्हा आम्हाला मानणार आहे? तोच देव, तोच आमची माता न् पिता, तोच आमची परीक्षा पाहणार आणि रक्षण करणार.’ तेव्हा मी म्हणतो-
तुम्ही जावे आपुल्या गृहासी ।
जें होणार तें निश्चयेसी । घडूनि येईल न टळेचि ।।
राहूची महादशा काय किंवा शनीची साडेसाती काय, प्रवाहपतित यच्चावत् सर्व मानवांना यथाकाळ यथाक्रम भोगणे प्राप्तच आहे आणि त्या भोक्तृ. त्यातच परमेश्वरी लीलेचा महिमा विचारवंतांनी प्रत्यक्ष अनुभवून, या सृष्टीच्या रहस्याचा ठाव काढावयाचा असतो. असा स्थितीत `देह जावो अथवा राहो। पांडुरंगी माझा भावो` या भावनेने परमेश्वर माऊलीच्याच पायी मिठी घालणे श्रेयस्कर, या विवेकाने विक्रमाने भटजींच्या जपजाप्याचा धि:कार केला आणि वाटेल तो प्रसंग आला तरी आपण आपल्या सत्त्वापासून रेसभरसुद्धा पराङ्मुख व्हायचे नाही, या कडव्या पोलादी निश्चयाने त्याने आपली आचार-विचारशक्ती मढवून काढली.
पुढे यथाकाळ विक्रमाच्या कन्याराशीला शनीची साडेसाती सुरू झाली. तिचा स्पर्श होताच चमत्कार घडला! एके दिवशी दुपारी सौदागराचा वेष घेऊन शनि विक्रमाच्या राजवाड्यात काही उत्तमोत्तम घोडे विकण्यासाठी घेऊन आला. राजाच्या चाबूकस्वाराने प्रथम एक घोडे रिंगणावर पळवून पाहिले आणि ते उत्तम असल्याचे सर्टिफिकेट दिले. शनि-सौदागराने तिसरा एक खास उमदा अवलादी घोडा दाखवून, त्याची परीक्षा हुजूर सरकारांनी करावी अशी शिफारस केली. विक्रम त्या घोड्यावर स्वार झाला, त्याला दोन तीन रिंगणे फिरविला आणि `वाः फारच छान घोडा आहे.’ म्हणून वाहवा केली. त्यावर सौदागराने म्हटले, "सरकार, घोड्याची परीक्षा नुसत्या रिंगणदौडीने व्हावयाची नाही. आपण त्यावर फेरफटका दौड करून पाहा. म्हणजे हा जनावराचे खरे तेज दिसून येईल." राजाला ही सूचना पटली. त्याने घोड्याला दोन फटके लगावून दौडीवर धरताच तो जो तडाड वर उडाला तो थेट अंतराळात वाऱ्यासारखा उडाला. सौदागरही इतरांप्रमाणेच आश्चर्याचे नाटक नटवू लागला. `राजाने माझा घोडा नेला तरी कुठे? मी किती वेळ वाट पाहणार? थोडा तरी द्या नाहीतर पैसे तरी द्या` असा त्याने वाजवी आग्रह धरला. शेवटी दिवाणाने घोड्याची किंमत सौदागराला देऊन त्याची बोळवण केली.
`सौदार गेलिया पाठी । मागे काय वर्तली गोष्टी` ती आता श्रवण करावी-
दूरदेश अति उजाडी । जेथे घोर वन महा झाडी ।
तेथे नदीच्या पैलथडी । घोडा जाऊनि उतरला ।।
तेथे राव उतरला खाली । तव नवलपरी वर्तली ।
वारू नाही नदी गुप्त झाली । झाडांझुंडां सहित ।।
सारी रात्र थंड्या फराळावर त्याच जंगलात विक्रमाने काढून, सकाळ होताच तो अंदाजाने एखाद्या नगराचा शोध करीत चालू लागला. चालता चालता त्याला एक तामलिंदा नावाची नगरी दिसली. व्यापारी पेठेत प्रवेश केला आणि सहर एका वैश्य व्यापारी सावकाराच्या पेढीजवळ थांबला.
सावकाराचे दुकानीं । विक्री होतसे द्विगुणी।
त्याणें भला माणुस जाणोनी । आदर केला तयाचा ।।
व्यापाऱ्याने जातगोत विचारली, तेव्हा
राजा म्हणे तया वैश्याशी । आम्ही क्षत्रिय असो परियेसी ।।
आमुचा मुलूख दूरदेशी । क्षण एक येथे उतरलो ।।
व्यापाऱ्याने विक्रम राजाचा सर्व प्रकारे आदर केला आणि मोठी `अति उत्तम षड्रसपूर्ण` मेजवानी दिली. भोजनोत्तर संभाषणात व्यापाऱ्याच्या आग्रहावरून विक्रम राजाने घडला सारा प्रकार यथातथ्य सत्य सांगितला. त्यावरून त्या वैश्य सावकाराचीही खात्री पटली की प्रस्तुत प्रकारात काही कल्पनातीत चमत्कार असला, तरी उज्जैनीचा विक्रम राजा म्हणतात तो हाच. ज्याची नुसती दुरून भेट होण्याची पंचाईत, तोच आज माझ्या घरी कामधेनूप्रमाणे आपण होऊन चालत आला. वैश्याचा आनंद काय विचारावा! पण बोलून चालून तो वैश्य, व्यापारी, सावकार, `तेलमे मख्खी आई तो उसकू भी नहीं छोड़ने वाला.` मग हा तर काय, प्रत्यक्ष विक्रमराजा आपल्या घरी चालून आलेला! काहीतरी अचाट स्वार्थ साधल्याशिवाय तो ही संधी फुकट थोडीच वाया जाऊ देणार? ही संधी कोणती?
त्या सावकाराची कन्यका । नाम तिचे अलोलिका ।
तिचा पण हाचि देखा । इच्छिला वर वरावा ।।
(मोठी आडदांड मुमताजच म्हणायची! या २०व्या शतकात सुधारणेच्या युगांत ती जरी कितीही सुशिक्षित म्हणायचा किंवा पदवीधर म्हणून असती, तरी निदानबापाच्या गळ्याचा फास सोडविण्यासाठी ती दावे बांधून देईल त्याच्या गळ्यात तिला माळ घालणे भागच पडले असते.)
परि तिस न मिळे इच्छावर । वैश्य शोध करी निरंतर ।
हा विक्रमराजा राजा परिकर । म्हणे यासि द्यावी कुमारिका ।।
लग्नाळू मुलीच्या बापाची दृष्टी अशीय असते. भेटीस येणाऱ्या प्रत्येक तरुणाकडे तो `कर्तव्य` दृष्टीनेच प्रथम पाहतो आणि साधारणतः `कर्तव्य नाही` कळेपर्यंत त्याचा उघड गुप्त पिच्छा पुरवितो वैश्याने विक्रमाकडे याच `कर्तव्याची दृष्टी रोखली, आणि आपल्या मुलीला हळूच जाऊन विनविले की,
बाई उत्तम वर आणिला तुजशी ।
आतां तू माळी घाली याशी । न करी अनमान ।।
हा स्वरूपें आहे सुंदर । बत्तीस लक्षणी परिसर ।
हा भाग्यवंत जाण वर । यासी वरी कुमारिके ।।
पण ती अलोलिका म्हणजे एक नंबरची ढालगज, इच्छावर शोधणारी, ती आपल्या बापाची व्यापारी पॉलिसी थोडीच चालू देणार!
तेव्हा कुमारी बोले पित्यासी । तुम्ही बहुत वर्णिता यासी ।
परी न भरता मम मानसीं । तंवरी न वरी निर्धारें ।।
आज पाहिन याचें लक्षण । कैसे चातुर्य काय ज्ञान ।
भाषणावरूनि प्रमाण । सर्व कळो येईल ।।
मुलीची इतकी संमति मिळताच त्या काळच्या रूढीप्रमाणे वैश्याने रंगमहालाची सिद्धता केली. आपण काय करीत आहोत, यागी मात्र त्याने वक्रतादाद लागू दिली नाही. रात्री भोजनोत्तर-
वैश्य म्हणजे क्षत्रियासी । जावे निद्रा करावयासी ।
अतिरम्य चित्रशाळेशी । तेथें सर्व विदित होईल ।।
बिचारा विक्रम रंगमहालात गेला. महिपतीने तेथेचा वर्णिलेला शृंगारघाट येथे पुन्हा उतरून जागा अडवण्यात अर्थ नाही. विक्रमाच्या जीवनात कल्पना महिरून जाईल इतक्या वेगाने आणि अचंब्याने अवघ्या ४८ तासांत घडून आलेल्या आणि येणाऱ्या परिस्थितीच्या पालटाने तो सुद्धा अगदी हतबुद्ध झाला. काल कोठे होते रात्री काय झाले आणि आज हा येथे काय प्रकार? असे हे फटाफट ट्रान्सफर सीन (बदल देखावे) कोण घडवीत आहे?
कर्माच्या गति असती गहना । जें जें होणार तें कदा चुकेना ।
तें तें भोगिल्याविण सुटेना । देवादिकां सर्वासी ।।
तरी हे शनिदेवाचे छळण । त्याणें ही माया रचिली जाण ।
आता काय व्हायचे ते होवो, बितली खरी. आता अंगचुकारपणा करून काय फायदा? ते नामर्दाचे काम असा विवेक करून विक्रमराजा पलंगावर जाऊन, पासोड्याचा बीथाडा मारून, झोपेचं ढोंग करून पडला. अशा परिस्थितीच्या माणसाला झोप ती कशी काय लागणार? इतक्यात ठरल्याप्रमाणे ती रूपसंपन तरुण अलोलिका रंगमहालात भरगच्च शृंगार करून आली. पाहते तो हे राजेश्री बोथाडा मारून निजलेले. विक्रमाला जागृत करण्याचे सर्व नाजूक शृंगारी प्रयोग तिने केले, पण काही केल्या स्वारी जागीच होईना! निद्रिताला कोणीही जागृत करील, पण झोपेचे ढोंग करून पडणाराला कोण जागे करणार? अखेर बिचारी चकली आणि खिन्न मनाने गळ्यातील मोत्याचा हार खुंटीवर ठेवून एका बाजूला तोंड फिरवून झोपी गेली.
विक्रमाच्या ऐवजी एखादा साधा अविक्रमी तरुण असता तर ही आयती चालून आलेली घरजावईपणाची संधी तो कधीच फुकट दवडता ना. शेकडा शंभर लोक असल्या संधीची सुखस्वप्ने नेहमी पाहत असतात. त्यांना हे स्वप्न आज प्रत्यक्ष सृष्टीत घडून येत असता, विक्रमाप्रमाणे विवेक साधला असता काय? मुळीच नाही. पण हा उज्जनीचा विक्रम, तो-
विचार करी मानसी । मी सत्ताधीर म्हणवितो ।।
परोपकारी माझें मन । पापास भितो रात्रंदिन ।।
ही तंव कन्या असे जाण । कैसे भाषण करावे ।।
यच्चयावत् सर्व प्रजेला पुत्रकन्यावत मानणारा मी चक्रवर्ती. मीच जर लौकिकी लोकांप्रमाणे अशा बिकट प्रसंगी विवेकाला पारखा झालो, मोहाला बळी पडलो, आणि सत्वापासून च्युत झालो, तर मी चक्रवर्ती विक्रम कशाचा? छे छे! ही तरुणी हव्या त्या उद्देशाने जरी मजकडे आली, तरी मी तिला कन्येप्रमाणेच लेखणार. विक्रमी पुरुषांनी आपल्या सत्त्वाला प्राणापेक्षाही अधिक सांभाळले पाहिजे.
विक्रमाने विवेकाच्या जोरावर कुमारी अलोलिकेपुरते आपले सत्त्व सांभाळले. व्यवहाराची शक्य ती बाजू त्याने राखली, पण ग्रहदशा प्रतिकूल झाली की ती इतके काही अचंब्याचे विरोधी प्रकार घडविते का त्यांना चमत्कार म्हणावे, का काय नाव द्यावे, हेच समजत नाही. कुमारी अलोलिका गाढ निजलेली पाहून विक्रम उठला. झोप लागत नाही तर या रंगमहालातील चित्रे पाहून तरी रात्र कंठू या, म्हणून एकेक चित्र पाहू लागला. तो काय चमत्कार! ज्या भिंतीच्या खुंटीवर अलोलिकेने मोत्यांचा हार टांगून ठेवला होता, त्या भिंतीवर एक हंसाचे चित्र रंगविलेले होते. आश्चर्याची गोष्टी की ही `भिंतीवरचा निर्जीव हंस` सजीव हंसाप्रमाणे त्या हराची मोत्ये मटामटा मटकाऊ लागला. अरेच्चा! एकेक मोती मटकावता मटकावता सगळा हार खलास झाला, तर करायचे काय? घडत आहे हा चमत्कार अखेर आपल्यावर काही तरी भयंकर गंडातर आणणार खास!
जरी हार घ्यावा काढुनी । तरी बिरुद जातसे निरसुनी ।
परांसि दुःख न द्यावे म्हणोनि । बिरुद असे माझे हें ।।
आता ब्रीद सांभाळू, व्यवहार पाहू, का या धडधडीत अशक्य परंतु या क्षणाला शक्य होत असलेल्या चमत्काराला थोपवू? मानवी कल्पनेला थांग लागणार नाही अशा होत्याच्या नव्हत्या आणि नव्हत्याच्या भलत्या चमत्कारिक घटना घडू लागल्या, तर मनुष्य कितीही शहाणा आणि धोरणी असला तरी त्याला अखेर मूर्खपणा पदरात घेऊन, येईल त्या प्रसंगाला साधेल तसे तोंड देणेच भाग पडले. जे काय व्हायचे असेल ते होवो, असा विचार करून विक्रमराजा पलंगावर झोपी गेला.
सकाळ होताच अलोलिका खडबडून जागी झाली आणि `म्हणे पित्याने हा वर आणिला जाण. अति मूर्ख नपुसंक ।।` तिला मोठा संताप आला आणि वस्त्रे वगैरे सावरून, मोत्यांच्या हारासाठी खुंटीकडे तिने पाहिले. तो हार नाहीसा झालेला
हार न देखे कुमारिका । ती म्हणे पांथिका अविवेका ।
हार घेऊनी महाठका । निद्रा केली सुखरूप ।।
तरी हार देई माझा झडकरी । तुज पचणार नाही चोरी ।
ऐसिया गोष्टीने तुझी थोरी । राहणार नाही तत्त्वता ।।
तरी हार दे माझा मजप्रति । मग त्वां जावे आपुल्या पंथी ।
याची चर्चा झालिया निश्चिती । नाश होईल शरीराचा ।।
विक्रमाला काहीच सुचेना. त्याने सांगितले, `बाईसाहेब, मला तुमचा हार माहीत नाही. मी तो घेऊ कशाला? घेऊन ठेवू तरी कोठे? केवळ आज रात्री मी यी ठिकाणी झोपलो. एवढ्याच कारणाने माझ्यावर या बालंटाचे वादळ उठवायचे असेल, तर खुशाल उठवा. मी कधी खोटे बोलणारा मनुष्य नव्हे. सत्त सांगतो मी तुमचा हार घेतला नाही.` अलोलिका तेथून जी तणतणत फणफणत निघाली ती थेट बापापुढे जाऊन उभी राहिली, आणि तावातावाने हात ओवाळून आणि तोंड वेंगाडून म्हणाली, `आहा हाहा हाहा. म्हणे अलोलिके हा घे तुला इच्छावर आणला. हा तर मेला नपुंसक नामर्दच्या नामर्द आणि मेला खापऱ्या चोर.’
तुम्ही ठक चोर आणिला घरा । तो तस्कर विद्येमाजी पुरा ।
तेणे चोरिले माझिया हारा । तरी तो मागूनी घेई जे ।।
अर्थात वैश्यालाही मोठा अचंबा वाटला आणि रागही आला. त्याने विक्रमवी हवी तशी खरडपट्टी काढली, वाटेल ते दोषारोप केले. अखेर नोकरांकडून खांबाला बांधून हवा तसा जीव जाईसा मार दिला. पण विक्रमाचे एक सत्य वचन- `मी हार घेतला नाही.`
एवढा मरे मरे तो मार खाल्ला तरीही हा हरामखोर चोर कबूल करीत नाही, तेव्हा हा मोठा बिलंदर उग दिसतो. यावर आत राजाच्या दरबारात खटलाच दिला पाहिजे. वैश्याने चंद्रसेन राजाकडे आपली फिर्याद दाखल केली. ताबडतोब पोलिसांनी विक्रमाला चतुर्भुज करून राजापुढे आणले. राजाने विक्रमाला विचारताच त्याने गुन्हा नाकबूल केला आणि काकुळतीने विनंती केली की-
ऐक राया चंद्रसेन ।
हार घेतला नाही जाणा । असत्य न बोले कदाहि ।।
हाराचा सांगावा विचार । तरी वृथा म्हणाल तुम्ही सर्व ।
न घडे तोचि विचार । घडला असे समर्था ।।
आम्हासि ग्रह नाही सानुकूल । नसती उत्पन्न होते कळ ।
त्याची काय करून हळहळ । होणार ते होतसे ।।
परंतु केवळ कायदेबाजी पलीकडे नजर न फेकणाऱ्या आणि पाच न् पाच दहा एवढीच व्यवहारी अक्कल असणाऱ्या कोणा शहाण्याचा या विधानांवर विश्वास बसणार? ग्रह अनुकूळ नाहीत, राहूची महादशा किंवा शनीची साडेसाती सुरू आहे. म्हणून माझ्यावर चोरीचा पैसे खालूचाचा किंवा खुनाचा आरोप आला आहे.
असल्या बचावाच्या पुराव्यावर कोणता शहाणा जज्ज आरोपीला दोषमुक्त करील? हा आरोप, हा पुरावा आणि ही शिक्षा, यापेक्षा चवथी दृष्टीच जगाच्या व्यवहारात नाही म्हणून विक्रमाने अखेरची विनंती राजाला केली.
बरें चोरी न करावी परंतु केली । परि आतां पाहिजे क्षमा केली ।
सर्व अपराध पोटी घाली । कृपा करी महाराजा ।।
याने तर आगीतच तेल ओतले. गुन्हा कबूल करून उलट बेशरमपणाने क्षमा मागतो. भुरटा चोर! पुन्हा मुद्देमाल देत नाही तो नाहीच. राजाचा क्रोध अनावर झाला.
सेवकासी म्हणे उठा सत्वर । तोडा याचे चरण कर ।
टाकून द्या नगराबाहेर । अन्न उदक न द्यावे ।।
शिक्षेचा उच्चार होण्याचीच चातड लागलीच विक्रमाला नगराबाहेर नेऊन, तेथे त्याचे हातपाय तोडण्यात आले आणि त्याला लांब एका उकिरड्यावर अन्नपाण्याशिवाय तडफडत फेकून देऊन, पोलीस आणि तमासगीर घरोघर परत गेले. साध्या चोरीच्या आरोपावरून इतकी भयंकर शिक्षा ठोठावणाऱ्या दयाळू व न्यायी चंद्रसेन राजाने पोलिसांना `तो मेला किंवा वाचला! त्याचा प्राण कोठे उरला` इतके विचारण्यास मात्र कमी केले नाही.
मग सेवक म्हणती महाराज । सत्वरची प्राण जाईल सहज ।
करचरणावीण आत्मराज । कैसे सुख पावेल ।।
उज्जनीच्या विक्रम चक्रवर्ती राजा, केवळ अवघ्या ४८ तासांच्या अवधीत, एका कोठच्या तरी मांडलीक राजाच्या शिक्षेने, हातपाय तुटून, कोठच्या तरी गावाच्या सीमेबाहेर उकिरड्यावर, अन्नपाण्याशिवाय तळमळत तडफडत पडावा. ह्या चमत्काराला दुर्दैव म्हणा किंवा ग्रहदशेचा फेरा म्हणा, पण तो अत्यंत कल्पनातीत आणि हृदयाला अचंब्याने पिळणारा आणि दुःखाने गिळणार नाही. असे म्हणणारा माणूस माणूसच नव्हे. आजही शनिमाहात्म्य वाचणारे लक्षावधी भाविक लोक विक्रमाची ही साडेसातीची कहाणी वाचताना डोळ्यांतून आसवांचा धबधबा पाडीत असतात.
आश्चर्याची गोष्ट एवढीच की कोणीही या कहाणीतले सत्य शोधण्याचा प्रयत्न करीत नाही. भाविक लोक लिहिला मजकूर अक्षरशः खरा मानतात. ज्ञान आणि अज्ञान यांच्या मध्यावर कोठेतरी असलेले, परंतु शिक्षित (एज्युकेटेड) म्हणून मिरवणारे माध्यमिक लोक काही गोष्टी खऱ्या व काही गोष्टी खोट्या मानतात; आणि विशेष ज्ञान्यांकडे पाहावे तो ते ह्या दोनही प्रकाराच्या लोकांना मूर्खात ढकलून आपल्या विद्वत्तेच्या हिमालयात थंडगार बसतात; किंवा स्वतःच्या अक्कलकाढ्याला `विशेष रामायण` ठरविण्यासाठी. जसा वारा वाहील तशी खंडन मंडनाची पाठ फिरवतात.
****
प्रकरण ४ थे
शनिमाहात्म्याकडे पाहण्याची दृष्टी
शनिमाहात्म्य म्हणजे एक काव्य. त्यातील तत्त्वांवर कवीच्या कल्पनेचे चढलेले वारूळ नीट बाजूला काढल्याशिवाय त्यात बसलेला तत्त्वरहस्याचा वाल्मिक मुनी दिसायचा नाही. विक्रमाच्या साडेसातीची कथा म्हणजे एका जिवंत खऱ्याखुऱ्या राजाच्या हालअपेष्टांची कहाणी मानली, तर त्यातल्या अनेक अशक्य गोष्टींचे समर्थन कोणालाही साधणे शक्य नाही; साधले किंवा तसा कोणी प्रयत्नच केला तर तो विवेकाला पटणार नाही. अर्थात हे काव्य कोणत्या तत्त्वरहस्याचे प्रतिपादन करण्यासाठी कवीने लिहिले, ह्याची बिनचूक दृष्टी आपण ठेवली, तर त्यातील अशक्य गोष्टीतील कल्पनेचेही वास्तविक स्वरूप आपणास पटत जाईल. आता विक्रमाच्या दरबाराचीच गोष्ट घ्या. तेथे त्याने शनीची कुचाळी केली नसती, तर शनीची साडेसाती आलीच नसती काय? गणिती अंदाजाने विक्रमाच्या कन्या राशीला शनीची पीडा जर होणारच होती, तर त्यासाठी दरबार कशाला, पंडित कशाला, शनीची कुचाळी कशाला, दरबारात प्रत्यक्ष शनि आला कशाला आणि स्वतः धमकी देऊन गेला कशाला? पण कवीचे काव्य त्याशिवाय रंगले नसते.
कथेच्या मंगलाचरणाला या दरबारातल्या भानगडीची जरूरच होती. प्रत्येक पुराणग्रंथाची सुरुवात `नैमिष्यारण्यात सूताने शौनकादिकांना प्रश्न` विचारल्यावर केलेली आढळेल. शनिमाहात्म्याच्या बाबतीत मात्र कवी तात्याजी महिपती या सूतशौनकांच्या भानगडीत न पडता एकदम उज्जनीच्या विक्रम राजाच्या दरबारात घुसला आणि पंडितांच्या वादविवादाने आपल्या काव्यग्रंथाची सुरुवात करता झाला. कोठचीतरी राजधानी आणि कोणीतरी राजा घेतल्याशिवाय कथा किंवा कहाणी रंगत नाही. लहान लहान मुलांच्या गोष्टीसुद्धा `एक होता राजा` याच शब्दांनी सुरू होतात. त्याप्रमाणे तात्याजी महिपतीने आपल्या कथेसाठी उज्जनीचा विक्रमराजा शोधून काढला, यात नवल नाही. नवल नसले, तरी त्यात त्याची शब्दयोजना आणि काव्यचातुर्य अत्यंत वाखाणण्यासारखे, विचार करण्यासारखे आणि विवेकी चिकित्सेलाही झुलविण्यासारखे दिसून येते.
शनीच्या साडेसातीचा महापराक्रम रंगविण्यासाठी कवीने `विक्रम` शब्द फार कुशलतेने योजलेला आहे. या एका शब्दाच्या अर्थावरच त्याने आपल्या काव्याची मनोरंजक इमारत उभारली आहे. हा अर्थ एकदा स्पष्ट उमगला की शनिमाहात्म्याचा आत्मा हाती लागला, असे समजावे. विक्रम शब्दातील अर्थाची खुबी नीट न ओळखता जो कोणी शनीमाहात्म्याच्या पारायणाने साडेसातीच्या तडाख्यातून निसटण्याची आशा धरतात. त्यांना पाठीवर साखरेची गोणी वाहणाऱ्या म्हशीच्या प्राणनावाचीच उपमा देणे रास्त होईल. शनीची साडेसाती हा शुद्ध गणिती कदरीचा रोखठोक फेरा आहे आणि त्याच्या तडाक्यातून भणंग भिकाऱ्यापासून तो नवकोट नारायणापर्यंत जर कोणीही सुटत नाही; तर तात्याजी महिपतीने एखाद्या चंद्रसेन इंद्रसेन राजाच्या ऐवजी विक्रम राजाच का पसंत केला? अशी वा विक्रम शब्दात काय जादू भरलेली आहे? या जादूचा उलगडा झाला की साऱ्या शनिमाहात्म्याचेच कोडे उलगडले!
विक्रम म्हणे महत्त्वाकांक्षी मनुष्याचा पराक्रम
उज्जैनीचा विक्रम म्हणजे उच्च जनीचा, लोकसमुदायावर विशेषत्वाने परिणाम करणारा, महत्त्वाकांक्षी, पुरुषार्थप्रिय अशा मनुष्याचा पराक्रम. शनीच्या साडेसातीचा ज्वालामुखी पुरुषार्थी आणि पराक्रमी पुरुषावरच विशेष फुटताना दिसतो; कारण त्या पुरुषाच्या सुखदुःखांवर अनेक लोकांचे सुखदुःख बरेच अवलंबून असते. त्यांच्या जीवनक्रांतीने बहुजन समाजाच्या आचार-विचारांत क्रांती घडवायची असते. एखाद्या भणंग भिकाऱ्याला साडेसाती आली तर त्याला पोटापुरती भीक न मिळता त्याची उपासमार होईल. एखाद्या घोडोपंताची बायको मरेल, कोडोपंतांची नोकरी जाईल, किंवा तिंबुनानांवर पैशाच्या अफरातफरीचा खटला चालू होईल. एखादा कोट्याधीश पारशी सट्ट्यात लाखी चट्टा खाईल अथवा लक्षाचीश मारवाड्याच्या पेढीवर दरोडा पडून, जन्माच्या तीन शेड्यापलीकडे कवडीही त्याच्या हाती उरणार नाही. पण यात विक्रम मात्र कोठेही आढळणार नाही. या असल्या साडेसात्या कितीक येतात आणि कितीक जातात. जगाला त्याची दाद नसते आणि दाद घेण्याची जरूर नसते. फार काय, पण कित्येक माणसेसुद्धा येरे दिवसा भर रे पोटा अशा मुर्दाड अवस्थेत जीवन कंठीत असतात की साडेसाती आली काय आणि गेली काय याची ते दखलही करीत नाहीत.
साडेसाती फक्त विक्रमाचीच
पराक्रम असेल तेथेच साडेसातीचा धुमाकूळ मोठा. पुरुषार्थाच्या प्रगतीलाच साडेसातीची डुक्करमुसंडी विशेष लागायची. लोकमान्य टिळक कोट्यधीश नव्हते. पण ते पट्टीचे पुरुषार्थी होते. कट्टे कर्मयोगी होते. राष्ट्राच्या भवितव्यासाठी प्राणाची किंमत कवडी मानणारे विक्रमी होते. स्वतःच्या चिमुकल्या संसाराच्या टीचभर स्वयंपाकघरापेक्षा बहुजन समाजाच्या कोट्यवधी पोटांच्या बंडासाठी बंड उभारणारे पराक्रमी बंडखोर होते. त्यांच्यावर शनीच्या साडेसातीचा ज्वालामुखी फुटला, तेव्हा सारे जग हादरे! कारण, त्यांच्यापाशी विक्रम होता. महात्मा गांधींची हीच स्थिती. शनीची वक्रदृष्टी फिरताच त्याने महात्माजीला इतक्या उंच नेले की अखिल भरतखंडाचे एकमेवाद्वितीय एकमुखी राष्ट्रसूत्रधार! गांधी बोले हिंदुस्थान हाले! अशी स्थिती.
महात्माजीला शनीने इतक्या उच्च शिखरावर का नेले? तर गांधीचा विक्रमच एवढा जबरदस्त की त्याची कसोटी पाहण्यासाठी शनीला शक्य तेवढ्या उंचीवर त्यांना नेऊन, मग धाडकन् खाली आदळावे लागले. गांधींचा अधःपात म्हणजे साऱ्या जगात धरणीकंपाचा हादरा! जो तो या अकल्प्य घटनेचा साधेल तसा आजहि विचार करीत आहे. कालचे गांधीचे माहात्म्य काय आणि आजचे काय! कशास काही मेळ? होत्याचे नव्हते झाले. मित्र शत्रू बनले. अनुयायी बिथरले. तत्त्वाला शिव्या देऊ लागले. चळवळ मेली. काही लिहिले बोलले तरी त्याचाही विपर्यास होऊ लागला. प्रकृती ढासळली. आता व्हायचे काय राहिले? साडेसातीच्या खराटा दाबून फिरला. जितका गांधींचा विक्रम थोर, तितकी कठोर शनिग्रहाची दृष्टी! अशी अनेक उदाहरणे देता येतील. तात्पर्य, विक्रम म्हणजे पुरुषार्थी पराक्रम, ही एकच कल्पना समोर ठेवून, तात्याजी महिपतीने शनिमाहात्म्याची उभारणी केली, इतके ध्यानात ठेवून सर्व पोथी वाचली, म्हणजे त्यातील निरनिराळ्या प्रसंगांचे मर्म कळू लागते.
विक्रम राजाने (१) शनीची कुचेष्टा केली आणि (२) पंडितांनी जपजाप्याच्या सुचविलेल्या उपायांचा धि:कार केला, या दोन मुद्यांचे आता स्पष्टीकरण करू.
विक्रमशाली पुरुष आपल्या उच्च ध्येयालाच परमेश्वर मानून त्याची अव्यभिचारी एकनिष्ठेने सेवा करतात. त्याच्या सिद्धीपुढे ते जगात कशाचीही पर्वा करीत नाहीत. त्या सिद्धीच्या प्राप्तीसाठी अंतर्बाह्य प्रयत्नांची त्यांची धडपड अखंड चालू असते. बरे वाईट, शुभ-अशुभ आणि यश-अपयश यांचा ते वाजवीपेक्षा फाजील विचार करीत नाहीत. आत्मसंयमनाच्या जोरावर त्यांनी आत्मविश्वासाची एवढी भरभक्कम कमावणी केलेली असते की, ध्येयाच्या प्राप्तीपुढे त्यांनी आपल्या प्रत्यक्ष प्राणावरही तुळशीपत्र ठेवलेले असते. मात्र एक मुद्दा वाचकांनी विशेष लक्षात घेणे अगत्याचे आहे की विक्रमी पुरुषाचे ध्येयक्षेत्र विशाळ आणि अफाट असते. एखाद्या संसाराइतके नसते. संसाऱ्याची धडपड स्वार्थासाठी, तर विक्रमशीलाची तळमळ परमार्थासाठी.
Greatest happiness of the greatest number- पुष्कळांचे पुष्कळ सुख त्याला विक्रमी पुरुषांची जेथे मूळची तयारी, तेथे गुरूचा अस्त झाला, तर त्याची त्यांना काय पर्वा? ग्रहगतीच्या परिणामांविषयी विक्रमी पुरुष अज्ञानी असतात, असा प्रश्न नव्हे. स्वयंनिर्णयी तडफीचे स्वालवंबनी व विशेषतः स्वार्थत्यागी असल्यामुळे इतर ओंडक्याबरोबर वाहत जाण्याचे साफ नाकारतात. प्रवाह किती का जोराचा असो, उलटा असो वा सुलटा असो, तो त्यांना दिसो वा न दिसो, केवळ ध्येयाच्या सिद्धीची एक ठराविक दिशा साधण्यासाठीते त्या प्रतिकूल प्रवाहालासुद्धा, सत्याग्रही पद्धतीने टक्कर मारायला कमी करीत नाही. पुष्कळांच्या पुष्कळ सुखासाठी जे विक्रमीवीर नानाविध दुःखांच्या आडातानी आपली मनोभूमिका पोलादाइतकी टणक बनवितात; राष्ट्रोद्धारातच आपला आत्मोद्धार शोधण्यासाठी जे आपल्या प्रामाणिक प्रयत्नांचा पिच्छा पुरवितात; आणि स्वतःला अजिबात विसरून जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा जीव हव्या त्या संकटांच्या आगीच्या खाईत झुगारण्यास केव्हाही सिद्ध असतात, त्यांना राहूच्या महादशेचा किंवा शनीच्या साडेसातीचा फेरा कितीसा भेदरवणार? `सबसे जी प्यारा.` प्रत्येक प्राणीमात्राला आपला प्राण प्यारा. त्या प्राणाचीच ज्या विक्रमाला तमा नाही, त्याने शनीच्या साडेसातीच्या धमकीला कवडीचीही किंमत दिली नाही, हे रास्त झाले.
टिळक आणि गांधी यांची उदाहरणे घ्या. टिळक तर ज्योतिषशास्त्रात अग्रणी. त्यांना काय या राहू शनीच्या आणि केतू मंगळाच्या दशा महादशा समजत नव्हत्या? परंतु भरतखंडाला गिळून बसलेल्या ब्रिटिश सत्तारूपी जिवंत शनीला ज्यांनी उघड उघड प्रतिकाराचे आव्हान देऊन, त्यांच्या कायद्याची, कैदेची किंवा काळ्या पाण्याची दिक्कत न बाळगिता, त्याच्या साडेसातीच्या जिवंत डावपेचांना, प्राणावर उदार होऊन, प्रत्यक्ष विरोधाच्या हजारो टकरा दिल्या, तो ज्योतिषज्ञ परंतु विक्रमी टिळक आकाशातील ग्रहांना पायातील जोड्यांप्रमाणे वागवीत गेला, यात काही आश्चर्य नाही. आकाशातील शनि पत्करला. त्याचा फेरा ३० वर्षांनी तरी येतो आणि केवळ साडेसात वर्षे छळून जातो. पण ब्रिटिश सत्तेच्या शनीची साडेसाती आज शंभर वर्षांवर जी हिंदुस्थानच्या पावणेआठीच्या (Emasculation) खपाटी बसली आहे, ती उठता उठत नाही आणि सुटता सुटत नाही.
टिळकांनी या शनीला त्यांच्याच पाचपेचांनी विरोध करून, त्याची दशा त्याच्या माथी थापली; पण गांधी तर टिळकांच्याही पुढे गेले! या सैतानी शनीच्या भारतीय अस्तित्वाला मुळांसकट उखडून टाकणे, हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे. असा त्यांनी छातीठोक जाहीरनामा फडकवून, आपल्या असहकारी चळवळीच्या बातेरी माऱ्याने त्याच्या पाऊण अधिक तेजाला कायमचे ग्रहण लावले. जो विक्रमी गांधी शस्त्रास्त्रसंपन्न ब्रिटिश सत्तेला `निकल जाव बाहर` अशी धमकी देताना, प्राणाची व सर्वस्वनाशाचीही दिक्कत बाळगीत नाही, तो आकाशस्थ राहू शनीची काय म्हणून पर्वा ठेवील? राजद्रोहाच्या कायद्याच्या चापात आपली मान हवी तेव्हा अचानक फासावरसुद्धा लटकली जाईल, याचीही ज्या गांधींच्या विक्रमाला पर्वा नाही, तो कुंडलीतल्या शनीच्या छळणाची किंमत काय करणार? अर्थात शनिमाहात्म्यातील विक्रम राजाने शनीच्या पराक्रमाची केलेली टवाळी अगदी रास्त होती, यात संशय नाही.
विक्रमाने ब्राह्मणांच्या जपजाप्यादि उपायांचा का धि:कार केला? मी म्हणतो का करू नये? येथे ब्राह्मण शब्दाचा अर्थ `व्यवहारकुशल शनी` असाच घेतला पाहिजे. विक्रमी पुरुषांच्या ध्येयसाधनांचे स्वरूप, ते साधण्यासाठी त्यांनी निश्चित ठरवलेले मार्ग, आणि त्यांच्या हृदयात अखंड भडकलेली कार्याची तळमळ, याची पुष्कळ शहाण्या व्यवहारपटूंना असावी तशी कल्पना असत नाही; मग आजूबाजूच्या तमासगिरांची आणि अंध अनुयायांची गोष्टच काढायला नको. प्रत्येकजण स्वत:ला शहाणा समजून, विक्रमी पुरुषाच्या आचारविचार उच्चारांवर आपल्या अकलेप्रमाणे अभिप्राय देत असतो. पण अखेरपर्यंत कोणालाही विक्रमाच्या खऱ्या स्वरूपाचा थांग लागत नाही. थांग लागला तर उज्जनीचा, उच्च जनीचा, लोकोत्तर विक्रम कसला? लोकोत्तर पराक्रमी पुरुषोत्तमांच्या चरित्राचे निरनिराळे टीकाकार निरनिराळ्या दृष्टीकोनांनी जे वाभाडे काढतात आणि गणपतीचा मारुती बनवितात, याचे कारण तरी हेच.
पुरुष कितीही लोकोत्तर विक्रमी असला तरी लोकसमुदायाचाच तो एक घटक असल्यामुळे, तो लौकिक व्यवहारातच राहतो. त्यामुळे बऱ्या वाईट प्रसंगी त्याच्याभोवती हितचिंतकांचा आणि उपदेशकांचा नेहमी गराडा पडलेला असतो. विशेषतः कार्यात प्रत्यक्ष भाग घेऊन चामडी सोलवटून घेणाऱ्यांपेक्षा नुसत्या उपदेशाच्या टकळीने जीभ झिजविणारांची संख्या मानव समाजात नेहमीच फार मोठी असते. उपदेशकांचा उपदेश किंवा हितचिंतकांची मसलत ऐकून घ्यायला विक्रमी पुरुष नाखूष नसतात. उलट त्यामुळे त्यांची पुष्कळ वेळा करमणूकही होते. परंतु त्यांच्या आचारविचारांची भरारी व धमक इतक्या उंचावर गेलेली असते, की त्यामानाने लौकिकी उपदेशकांचे उपदेश ताडाच्या कानात तुळशीने कानगोष्ट सांगण्याइतके बुटबैंगण आणि खुळचट ठरतात. विक्रमाला करावयाचा उपदेश आणि द्यावयाचा सल्ला तितक्याच विक्रमी दर्जाचा असावा लागतो. पण येथे पहावे तो पंडित ज्ञानी म्हणविणारांच्या अकलेची मजल तंत्रमंत्रादि जपजाप्यापलीकडे जाईच ना. तेव्हा विक्रमाने त्यांचा हसत हसतच धि:कार करण्यापेक्षा अधिक काय करावे?
`करंटे मिळाले सर्वही । जो तो बुद्धीच सांगतो.` अशा प्रसंगी विक्रमी पुरुष सर्वांची वटवट ऐकून घेऊन, आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर, आत्मचिंतनातून निघालेल्या निर्णयाबरहुकूम कार्यक्षेत्रात निर्वाणीचा घाव घालीत असतो. चामडी बचावून व्यवहारकुशलतेने साधेल ते कार्य करू पाहणारे प्राणी निराळे, आणि प्राणाची पर्वा न ठेवता पुष्कळांचे पुष्कळ सुख साधणारे लोकोत्तर विक्रमी पुरुष निराळे. त्यांच्या विक्रमी मनोवृत्तीची धडाडी, त्यांच्या वंशा गेल्याशिवाय आकलन केल्याची शेखी मिरवून, त्यांना उपदेश करणाऱ्या शहाण्यांना श्रीसमर्थ रामदासांनी `करंटे` ही पदवी बहाल केली आहे.
विक्रमाच्या कहाणीतील तत्त्वाचे सत्यशोधन करण्यासाठी, शनिमाहात्म्यावर कवीने पांघरलेला कवित्वाचा पासोडा तर आपल्याला साफ दूर केलाच पाहिजे; पण त्याच वेळी मानवी संसार आणि व्यवहार ह्यात नित्य घडणाऱ्या गोष्टीही चाणाक्षपणाने विचारात घेतल्या पाहिजेत. सामान्य दर्जाचे आणि विचारांचे लोक आणि असे लोक शेकडा ९८ असतात! रोजच्या दिनचर्येत घडणाऱ्या गोष्टींचा का? कसे? या दृष्टीने विचार करून, त्यांच्या कार्यकारणांचा परस्पर संबंध शोधण्याची मुळीच खटपट करत नाहीत. असल्या लोकांना विक्रमाची कहाणी म्हणजे केवळ अद्भुत चमत्कार, देवाची करणी किंवा सब झूट यापैकी काहीतरी एक असावी, असे वाटणे अगदी शक्य आहे. जे विचारी जन आहेत आणि असा माणूस हजारात एकादाच! ते आपल्या चरित्रातील हकीकतींचा कार्यकारणभाव चौकस बुद्धीने नित्य संशोधन करून, त्यात मिळालेल्या अनुभवांचा संशोधनप्रकाश कर्तव्याचा पुढील क्षेत्रावर पाडून, पुरुषार्थाची शिकस्त करीत असतात. आपल्या रोजच्या दिनचर्येत घडणाऱ्या लहान-मोठ्या, बऱ्यावाईट सोप्या कठीण, उघड- गुप्त आणि साहजिक चमत्कारिक, सर्व हकीकतींच्या उत्पत्ती-स्थिती-लयाची चिकित्सा करूनच माणसाच्या अनुभवाचा खजिना श्रीमंत बनत असतो. अनुभवी आणि बिन अनुभवी माणसाची कसोटी याच चिकित्सेवर अवलंबून असते. `असे का झाले? का व्हावे?` अशा चिकित्सेने आपल्या क्रांतिमय चरित्र्याचे शोधन करणाऱ्या विचारवंताला विक्रमाच्या कहाणीत `अशक्य` असे फारसे काही आढळणार नाही.
****
प्रकरण ५ वे
आकाशस्थ ग्रह माणसांची सोंगे घेतात काय?
आकाशस्थ ग्रहताऱ्यांचा परिणाम माणसांवर होतो, ही कल्पना खरी धरून चालले, तरी एखाद्या विक्रम राजासाठी किंवा गुंडोपंतासाठी, शनीचा तारा माणसाचे रूप घेऊन पृथ्वीवर येऊ शकतो, ही कल्पना कोणालाही पटणार नाही. शनि, मंगळ, बुध इत्यादी मुख्य नऊ ग्रह आणि इतर तारे पृथ्वीप्रमाणेच अंतराळात सूर्याभोवती ठराविक गतीने परिभ्रमण करणारे तारे आहेत. एकमेकांवरील जिवांच्या बोकांडी बसण्यासाठी, हे तारे किंवा ग्रह माणसांची रूपे घेतात, असे मानण्याला कसलाही आधार नाही. ही कल्पनाच मुळात खुळचट दिसते आणि तशी ती आहेही. शनि जर माणसाचे रूप घेऊन पृथ्वीवरील विक्रमाच्या किंवा गुंडोपंताच्या घरी बिनचूक पत्त्यावर अचूक येऊन भेटतो, तर आमची पृथ्वीसुद्धा असेच काही तरी बाई बुवाचे रूप घेऊन, इतर नऊ ग्रहांवरील रहिवाशांच्या बोकांडी बसायला कशावरून जात नसेल? शनीची साडेसाती जर पृथ्वीवरील लोकांच्या मानगुटीला असते, तर आमच्या पृथ्वीची पावणेआठी शनिग्रहावरील रहिवाश्यांच्या खपाटीला कशावरून बसत नसेल?
`अ`ला जर `य`चे आकर्षण बरे वाईट भोवते, तर तेच आकर्षण `अ`ला बाधलेच पाहिजे. हा निसर्गाचा शास्त्रसिद्ध सिद्धांतच आहे. सर्व ग्रह नक्षत्रादि ताऱ्यांचे विश्वचक्र सूर्याभोवती परस्पराकर्षणाच्या तत्त्वावरच अखंड परिभ्रमण करीत असते. तेव्हा एकमेकांच्या आकर्षणाच्या तत्त्वावरच अखंड परिभ्रमण करीत असते. तेव्हा एकमेकांच्या आकर्षणांच्या दशा एकमेकांवर आदळल्या, किंवा आदळत असल्या, तर त्यात काही चमत्कार नाही. पण, पृथ्वीवरील एखाद्या व्यक्तीची हाडे साडेसातीच्या घणाने चेचण्यासाठी, किंवा महादशेच्या तापल्या तव्यावर त्या व्यक्तीचे थालीपीठ भाजण्यासाठी शनि, राहू, मंगळ कंपनीचे सर्व सन्मान्य भागीदार माणसांची रूपे घेऊन येतात, ही कल्पना कवीच्या कवित्वाला शोभली, तरी त्यातही काही विचार करण्यासारखे रहस्य किंवा तत्त्व नाही, असे मात्र मुळीच नाही.
शिवाय, आपण असाही विचार केला पाहिजे की एकंदर जगाच्या किंवा एकच राष्ट्रातल्या लोकसंख्येमध्ये एखादी व्यक्ती म्हणजे दर्यामे खसखसुद्धा ठरणार नाही. मग, या अनंत विश्वाच्या विस्तारात मनुष्याला कीटकाची तरी किंमत किंवा महती असू शकेल काय? मनुष्य स्वतःला केवढेही महत्त्व देत असला, तरी एकंदर विश्वरचनेत त्याच्या वाट्याला फुटक्या कवडीचीही किंमत येणार नाही. (राजा राजा म्हणजे तरी कोण? केवळ एक माणूस, आणि माणूस म्हणजे एक क्षुद्र किडा.) अशी शेक्सपियरची एक उक्ती आहे. अशा मानवी किड्यांनी अंतराळात कोट्यवधी मैलांवर परिभ्रमण करणाऱ्या `शनीची माझ्यावर वक्रदृष्टी आहे, राहू माझ्या धनस्थानावर पाहत आहे, किंवा मंगळ चंद्री सुंद्रीच्या लग्नस्थानी बसला आहे.`
अशी भाषा बोलणे आणि तसल्या कल्पनेत मग्न राहणे, ही कदाचित माणसांची माणुसकी ठरत असली, तरी कीटकवत् मनुष्याने शनि, मंगळाची नजर आकर्षण करण्याइतके आपले महत्त्व तोंडच्या वाफाऱ्याने वाढवून घेणे, हा मनाचा व बुद्धीचा क्षुद्रपणा होय. बरे, पृथ्वीवरील लोकांकडे पाहिले, तरी त्यातही अनेक भेद असल्यामुळे, तेही एकमेकांची पर्वा करीत नाहीत. राष्ट्राची गोष्ट सोडा, एखादा लहानसा समाज अगर जात घ्या, फार काय पण एखादे कुटुंब घ्या, त्यातील व्यक्तीसुद्धा फारशी एकमेकांची पर्वा करीत नाहीत. हिंदुस्थानात तर हा देखावा घरोघर पाहावयास मिळतो. मुंबईसारख्या बकाल वस्तीच्या शहरातील चाळींची खुराडी पाहा. दहा खोल्यांची एकच चाळ, पण त्यातील दहा कुटुंबाची तोंडे वीस दिशांकडे! कोणालाकोणाची पर्वा नाही. प्रत्येकाच गृह निराळे, ग्रह (एकमेकांविषयीच्या समजुती) निराळे आणि व्यवसायही निराळे. कोणी कोणाकडे ढुंकूनही पाहत नाही.
असल्या माणूसघाण्या माणसांची घाण तेवढी शनि, राहूला यावी आणि त्यांनी या फटकळांची बिनचूक अटकळ बांधून ठराविक घटकेला त्यांच्यावर सरळ किंवा वाकडी दृष्टी फेकावी, ही किती मूर्खपणाची कल्पना! बापाने लेकाला लाथ मारावी, लेकाने बापावर परत आहेराची मात करावी, भावाने भावावर घाव घालावा आणि नवऱ्याच्या महादशेला कंटाळून बायकोने तळी विहिरीचा ठाव घ्यावा, हीच ज्या लोकांच्या संसाराची आणि व्यवहाराची तन्हा, त्या लोकांच्या साठी राहू, शनीने माणसांची रूपे घेऊन, त्यांच्या बिन्हाडांचा पत्ता काढीत काढीत पोष्टमनाप्रमाणे सादर हजर व्हावे, हा कसला पाणचट कोशिंबिरीचा आंधळा खेळ? ज्यांना गावात कोणी पुशीत नाही, आणि आळी चाळीत कोणी विचारीत नाही, त्यांची दखल दूरवर अंतराळातल्या राहू, शनीने घ्यावी, यात शहाणपणाचा आणि मोठेपणाचा वाटा त्या लोकांकडे जातो का शनि राहूकडे जातो, हे कोणी आणि कसे ठरवावे?
आजच्या गुलाम हिंदुस्थानात हिंदू आणि मुसलमान असे दोन मोठे प्रमुख समाज आहेत. ज्योतिषशास्त्र आणि तज्जन्य दैववाद हो तर हिंदूच्या पाल पुजलेला, पण महम्मद पैगंबराने ज्योतिषशास्त्र क्षुद्र उरवून, ज्योतिष्यावर विश्वास न ठेवण्याबद्दल एकजात सर्व मुसलमानांना कडकडीत शासन सांगितले असूनही हिंदू ज्योतिषाच्या जोडीनेच इस्लाम, रमलवाला सर्वत्र बेफाम बोकाळलेला दिसतोच. या दोघाही कुडबुड्या देवपरीक्षकांनी मनाशी असा विचार केला पाहिजे की ज्या हिंदी माणसाला हिंदुस्थानाबाहेरच्या जगात गुलामाइतकाही मान न देता कोणी त्यांची दाद घेत नाही, त्याच गुलामांकडे आकाशस्थ शनि, राहू, गुरुग भल्या बुऱ्या दृष्टीची फेक बिनचूक करण्याची एवढी काय जरूर पडली आहे? हा सर्व प्रकार `राजा माझ्याशी बोलला` या गोष्टीइतकाच पोरकट होय, गो मुळीच शंका नाही.
मग विक्रमाकडे शनि सौदागराचा वेश घेऊन आला, हे कल्पित काव्य का कल्पित कादंबरी? दोन्हीही नव्हेत. प्रत्येक अवतारापूर्वी `पृथ्वी गायीचे रूप घेऊन क्षीरसागरात श्रीविष्णुकडे गेली` या कविकल्पनेत जे तत्त्व आहे तेच ह्यात आहे. वास्तविक, अंतराळात (पृथ्वीप्रमाणेच) सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे कोणतेही ग्रह, तारे अथवा नक्षत्रे माणसाची रूपे घेऊन खंडो गुंडोच्या बोकांडी बसण्यास येतात, ही कल्पना अशक्यातली अशक्य आणि अशास्त्रीय होय. विशेषत: या आकाशस्थ ग्रहांना `देव` मानणे, हा तर आमच्या देवभोळेपणाचा कळसच होय. शुक्र, गुरू, मंगळादि तारे हे जर पुल्लिंगी देव, तर ही आमची पृथ्वी `देवी` का नसावी? कितीजण या देवीची पूजा करतात? शनिमाहात्म्याप्रमाणे पृथ्वीमाहात्म्य आणि तिचे एखादे अनुष्ठान का नसावे? अंतराळातले दूरस्थ ग्रहदेव जर आम्हाला बरे वाईट भोवतात, तर ही अगदी निकटची, अगदी घरातली ग्रहदेवी पृथ्वी आमच्या राशीला का कधी येऊ नये? का, अतिपरिचयात अवज्ञा? निदान हिंदुस्थानातल्या हिंदू लोकांना या दुर्गणाचे बाळकडूच मिळाले दिसते.
स्वदेशापेक्षा यांना परदेशाची काळजी फार. इहलोकापेक्षा परलोकीच्या ऐश्वर्याची भूक फार. स्वदेशात स्वदेशबंधु उपाशी मेला तर हे त्याकडे ढुंकून पाहणार नाहीत; पण इंग्लंडातल्या अग्निप्रलयाने किंवा जपानातल्या धरणीकंपाने भिकेला लागलेल्या परक्यांसाठी हे परलोक्ये हिंदू लाखो रुपयांचे फंड पाठवतील. स्वदेशी विद्वानाला किंवा कारागिराला कसलेही उत्तेजन न देता उपाशी मारतील; पण परदेशच्या हव्या त्या गोऱ्यागोमट्या भुरट्याला देव म्हणून डोक्यावर घेऊन नाचतील आणि ऐहिक मोक्षासाठी त्याची पायतणे चघळतील. स्वकीयांना क्षुद्र किंवा शत्रू लेखून, परक्यांचा उदो उदो करण्याची वृत्ती हिंदू लोकांत पिंडप्रधान असल्यामुळेच हिंदुस्थान म्हणजे परक्यांना चरण्याचे एक मुक्तद्वार कुरण होऊन बसलेले आहे. असल्या आत्मद्रोही हिंदूंना पृथ्वीपेक्षा आकाशस्थ ग्रहांचा ऊरफोडी धोसरा का असू नये? तात्पर्य, हा सर्व भावनावश आणि पोटार्थी लोकांच्या कल्पनेचा खेळ असून, `मानला तर देव नाही तर घोडा` एवढ्याच दृष्टीने त्याकडे आपण पाहिले पाहिजे.
जनता भयंकर संकटांनी आणि छळांनी त्रासून गेली, सर्व उपाय हरले, आणि मृत्यूशिवाय दुसरा तरणोपाय उरला नाही, म्हणजे श्रीहरीची प्रार्थना करण्यापेक्षा तिला गत्यंतरच नसते. `देवा आता धाव` अशा गरीब गायीप्रमाणे जनतेच्या उघड किंवा गुप्त ज्या हाका आरोळ्या होतात. त्यालाच कवीने `पृथ्वी गायीचे रूप घेऊन श्रीविष्णूकडे गेली` या कल्पनेने रंगविले आहे. या पलीकडे त्यात विशेष काही चमत्कार किंवा आश्चर्य नाही. पृथ्वीवरील लौकिकी व्यवहाराच्या सर्व बऱ्या वाईट संघटना किंवा विघटना लोकांनीच घडवून आणावयाच्या असतात. तुफाने, वावटळी, धरणीकंप, विद्युत्प्रहार वगैरे प्रकार निसर्गाचे असले तरी त्यांनाही पायबंद लावून, त्यांच्या मारकपणाला पद्धतशीर वळवून तारक बनविण्याचीही शक्ती माणासंनी आजमावलेली आहे. मनुष्याची कल्पनाशक्ती म्हणजे विश्वविधात्या परमेश्वराला जवळ जवळ एक प्रकारचे चॅलेंजच (सामान्यांचे आव्हानच) म्हटले तरी चालेल. प्राचीन काळी कालिदासाने केवळ एका काव्यात कल्पनेची वावडी अंतराळात भिरकावून मेघदूत निर्माण केला. पण या २०व्या शतकात प्रगमनशील मानवांनी खास बिनतारी तारायंत्र तयार करून मेघदूताची काव्यमय कल्पना आज प्रत्यक्ष सृष्टीत शक्य करून ठेवली आहे. गायीचे रूप घेऊन गेलेल्या पृथ्वीला श्रीविष्णूने `मी अवतार घेऊन येतो` असे दिलेले आश्वासन तात्काळ साऱ्या त्रिभुवनाने ऐकले आणि आनंदाची एकच टाळी पिटली. कौरवांच्या चक्रव्यूहात अभिमन्यू एकटा सापडला व बेशुद्ध स्थितीत असता कौरवांनी ठार मारला. तात्काळ `ती अशरीरिणी वदली । धर्मयुद्धे नव्हे हे ।।` हे धर्मयुद्ध नव्हे; अशी बिनदेहाची, बिनयंत्राची अदृश्य अशी आकाशवाणी झाली. आज बिनतारी ब्रॉडकास्टिंग आणि मेगॅफोन कर्णा हीच कामे हुकमी करतात.
वायरलेस ऊर्फ बिनतारी म्हणजे आजकालची अशरीरिणीच नव्हे तर काय? पूर्वी म्हणजे स्वर्गातल्या इंद्राच्या दरबारातल्या अंजनीची ललकारी पृथ्वीवरील इंद्रप्रस्थच्या नृपतीला ऐकू येत असे. आज बिनतारी रेडियो लंडनच्या हॅरी लॉडरचा जलसा मुंबई सीलोन कलकत्त्यास हवा त्याला घरबसल्या ऐकवतो आणि कलकत्त्याच्या प्रोमोदा कोमाराची सारंगी न्यूयॉर्कच्या लक्षावधी रसिकांना हुबेहूब सुनावतो. मनुष्याच्या प्रगमनशीलतेने आज निसर्गालासुद्धा चिमटीत धरून त्याला हमाल बनविण्यात केलेली कमाल पाहून, शनि, मंगळादि ग्रहांच्या पोटात खात्रीने भीती धडकी भरली असावी, यात काही संशय नाही. कारण, आता अवघ्या पृथ्वीला चोखाळून, माणसांनी आपल्या तीक्ष्ण संशोधनाचा मोर्चा आता या शनि, मंगळ ग्रहांकडे वळविला आहे.
आतापर्यंत आकाशस्थ सर्व प्रमुख ग्रहांचे फोटोग्राफ्स काढलेच, पण मंगळावर मानवांची वस्ती खास असली पाहिजे, या अदांचे सत्य हुडकविण्यासाठी गुदस्त साली इटलीच्या आल्प्स पर्वताच्या अत्युच्च शिखरावरून मंगळावरील लोकांना इलेक्ट्रिक लाईटच्या (विद्युत्प्रकाशाच्या) खुणाही करण्यात आल्या. बेटे अजून उलट सिग्नलांची उत्तरे देत नाहीत! किती दिवस गप्प बस ते आम्ही पाहून घेऊ आणि एकदा का त्या मंगळ्या लोकांची दातखिळी उघडली की ‘मंगळ ग्रह महाक्रूर । जैसी का ते खड्गाची धार ।` आहे, का मुमताजसारखी चवचाल नार आहे, याचा तेव्हाच उलगडा होईल. मनुष्यप्राणी इतका जबरदस्त हिकमती आणि पराक्रमी असताही, पुष्कळ माणसांनी शनि, राहूच्या वक्र किंवा चक्र दृष्टीला इतके का भेदरावे, हे समजत नाही.
पृथ्वीवरील इहलोकाचे सर्व बरेवाईट व्यवहार माणसेच करतात. सुखाचा पाऊस पाडणे किंवा दुःखाची आग भडकविणे; स्वराज्य भोगणे किंवा परक्यांचे गुलाम होणे; इतरांच्या दुःखनिवारणार्थ स्वतः दुःखाला कवटाळणे, किंवा स्वतःच्या हितासाठी दुसऱ्याची मुंडी मुरगळणे, वगैरे सर्व हालचाली माणसेच चालवीत असतात. महालक्ष्मीच्या घोडदौडीत किंवा गोव्याच्या तिकीट फडफडीत एखाद्या राखाड्या शंखोबाचा लाखाड्या व्यंकोबा बनला किंवा माफीचा साक्षीदार होऊन एखाद्या मानवी राक्षसाने आपल्या मायदेशाची मान ऐन यशाच्या घटकेला कापली, तरी त्यातही आम्ही माणसांच्याच धडपडी कारण असतात. आम्हा माणसांशिवाय या पृथ्वीवरील चैतन्याचे पानसुद्धा हालणार नाही. एकमेकांच्या गळ्याला मिठ्या मारणारे किंवा फास लावणारे मित्र आणि शत्रू आमचे आम्हीच.
त्यात तिसऱ्या कोणा आकाशपाताळस्थ ग्रहांची लुडबुड मुळीच नसते. विशेष आश्चर्याची गोष्ट एवढीच की, माणसाला सुखाची समृद्धी असली, किंवा त्याला अवचित काही धनलाभ झाला, तर मात्र त्या वेळी, `कोणत्या ग्रहाच्या मेहरबानीने हे असे घडले?` याची ज्योतिष्याजवळ चौकशी करण्याच्या यातायातीत तो हटकून पडत नाही. एखाद्या मित्राने सहजगत्या आपल्याला सिगारेटकिंवा तपकिरीची चिमूट दिली तर वर्तमान रिवाजाप्रमाणे `थँक यू`ने आपण त्याचे आभार मानतो. पण धनलाभ किंवा इतर काही लाभ झाले, तर लाभग्रहाची चौकशी करून त्याला अनुष्ठान किंवा इतर काही लाभ झाले, तर लाभग्रहाची चौकशी करून त्याला अनुष्ठान तर राहोच पण नुसता नमस्कार करण्याचीही आम्हाला शुद्ध नसते. त्यावेळी `यांत कसला आला नमस्कार आणि ग्रहदशा?` हा सरळ व्यवहारी धोरणाचा पडताळा आहे. घेतले तिकीट, लागला नंबर, घेतले कंत्राट, एकाचे शंभर. लागला घोडा, पणतीच्या जागी झुंबर.
यात कसले आले ग्रह आणि दशा? `हमारा तखदीरही ऐसी जबरदस्त है.` असे उद्गार काढून स्वारी पार मोकळी! माझ्या परिचयाचे एक शाक्तमार्गी व्यापारी ढब्बू आपल्या पैशाच्या उबाऱ्याच्या धमकीने नेहमी असे उद्गार काढता की `My money is my God. On the strength of money, I make any man, whether high or low, bend his knees before me.` (पैसा माझा परमेश्वर. पैशाच्या जोरावर मी हव्या त्या छोट्या बड्या माणसाला माझ्यापुढे ढोपरे टेकायला लावू शकतो.) ही गोष्ट खरी आहे; आणि मोठमोठ्या सरकारी अधिकाऱ्यांपासून तो खेड्यातल्या भिवबा पांडबा शेतकरी व बाळंभटापर्यंत सर्व लोक या झब्बूपुढे रिंगणातल्या घोड्या-कुत्र्याप्रमाणे कसे नाचतात, हेही मी स्वतः अनुभवलेले आहे. पण ज्यावेळी २४ तासांच्या आत `Your money-God nothing more than shoe.` (तुझा पैसा परमेश्वर म्हणजे माझ्या पायातले खेटर) हा सिद्धांत त्या मुर्दाडाला मी सक्रीय पटवून दिलेला आहे.
उलटपक्षी, माणसाचा व्यवहार बिघडला किंवा कोणी बिघडवला, तो लाखाधीशाचा खाकाधीश बनला, धंदा बुडाला किंवा नोकरी गेली, अगर सुखाच्या भरतीतून दुःखाच्या खडकावर आदळू लागला की मग तो आकाश पाताळातले ग्रह हुडकू लागतो. ज्योतिष्याच्या पंचांगात साष्टांग पडतो, जवळ दिडकी नसली तरी उसनवारी करून मारुतीच्या तेल शेंदराची सरबराई ठेवतो, गावातल्या बाई-बुवांच्या मठात भगताची दीक्षा घेतो, ताईत गंडेदोऱ्यांची भेंडोळी गळ्यात अडकवतो, पंचाक्षऱ्याला घुमवतो, गुरुचरित्र किंवा शनिमाहात्म्याच्या पारायणावर झोड उठवितो, काय वाटेल तो करतो. याच वेळी त्याला देवाची आठवण होते. ह्याच प्रसंगी तो श्रीहरीला शरण जातो. ह्याच संकटकाळी त्याची मनोभूमिका लोण्यासारखी मऊ बनून त्यात भक्तीचे बीज थरारते. ह्याच कठोर अवस्थेत त्याचा दृष्टीकोन निवळून तो अखिल जगताकडे माणुसकीच्या नजरेने पाहू लागतो. सुखाबरोबर दुःख, भरती मागून ओहोटी, प्रकाशापाठोपाठ अंचार, दिवसानंतर रात्र, हा जगाच्या व्यवहाराचा क्रम आहे. म्हणूनच ही सुखाला लालचटलेली मानवी दुनिया परमेश्वराला थोडी तरी आठवते.
आकाशात ग्रहांनी माणसांकडे फक्त संकटे आणि दुःखेच पाठविण्याचा काही खास मक्ता घेतलेला नाही. ग्रहांचे जसे दुष्परिणाम घडतात, तसे सुपरिणामही घडतात. दुष्परिणामाच्या वेळी माणसे ग्रहगतीचा विचार करतात. सुपरिणामाच्या वेळी करीत नाहीत. परंतु हे बरे वाईट परिणाम घडविण्याची जाणीव त्या त्या ग्रहांना असते, असे मुळीच नाही. प्रत्येक ग्रहाचा काही विशेष निरनिराळा गुणधर्म आहे आणि पृथ्वीसह सर्व ग्रह एकमेकांशी परस्पराकर्षणाने जखडले असल्यामुळे, त्या त्या गुणधर्माचे परिणाम गति स्थितीप्रमाणे एकमेकांवर आपोआप होत असतात. दुसऱ्या प्रकरणात घेतलेले तीनरंगी काचांचे उदाहरण घ्या. सूर्यप्रकाश एकच प्रकाशधर्मी, पण तांबडी काच आड येताच, तिच्यातून जाणाऱ्या किरणांचे परिणाम निरनिराळ्या रंगाच्या कपड्यांवर निरनिराळे घडत आहेत, याची जाणीव किंवा संवेदना त्या तांबड्या काचेला असणे शक्य नाही. लोहचुंबकाला लोह आकर्षण करण्याची शक्ती असते; पण त्या त्याच्या गुणधर्माने टाचणी खेचली की मोठी आगबोट खेचली, याची त्याला जाणीव असते नाही.
लोखंड तडाक्यात आले की खेचायचे एवढाच त्याचा गुणधर्म सूर्य प्रकाश देतो असे आपण म्हणतो. पण तो प्रकाश देतही नाही आणि फेकीतही नाही. `प्रकाश असणे` हा सूर्याचा गुणधर्म. पण मी तो आता पृथ्वीवर सोडतो, शनीला देतो, चंद्रावर पसरतो, असे तो म्हणत नाही, मानीत नाही, समजत नाही. आपल्या प्रकाशधर्माचे परिणाम कोठे किती आणि कसे होत आहेत, ह्याची सूर्याला मुळीच जाणीव नसते. त्याचप्रमाणे राहू, शनि मंगळादि आकाशस्थ ग्रहांचे त्यांच्या परस्पर गुणधर्मानुसार पृथ्वीवरील पदार्थमात्रावर जे जे बरे वाईट परिणाम घडतात, त्यांची त्या ग्रहांना कसलीही जाणीव नसतानाही तांबडी काच आड आल्यामुळे माझा पांढरा सदरा तांबडा झाला, पिवळा नारंगी बनला आणि निळा जांभळा रंगला, ही भाषा आपण बोलतो, पण त्या भाषेचे त्या काचेला काय? माझ्यातून सूर्यप्रकाश गेल्यामुळे हे तीन निरनिराळे परिणाम घडत आहेत, याची त्या काचेला कसलीही संवेदना अगर जाणीव नसते. अर्थात शनि माझ्याकडे पाहत आहे, मंगळ माझ्या धनस्थानावर उखडला आहे किंवा राहू माझ्या तनुस्थानी धरणे धरून बसला आहे, असली भाषा खोटी आणि सर्वस्वी वायफळ होय. आपण ज्या पृथ्वीवर प्रत्यक्ष राहतो, तिच्याप्रमाणेच इतर सर्व आकाशस्थ ग्रह धोंडे, दगड, मातीचे जड अचेतन गोळेच आहेत. चंद्रग्रहणात पृथ्वीची छाया चंद्रावर पडते, पण तिची पृथ्वीला थोडीच काही जाणीव अगर संवेदना असू शकते? ग्रहणे म्हणजे ग्रहांच्या परिभ्रमणगतीची शुद्ध गणिती आकडेमोडी. हवेवर किंवा पृथ्वीवरील पदार्थमात्रावर ग्रहणांचा काही जरी बरावाईट परिणाम होत असला, तरी तो परिणाम मी घडवीत आहे, याची जाणीव पृथ्वीला, चंद्राला अगर सूर्याला मुळीच नसते.
असले हे दगडमातीचे अचेतन जड गोळे पृथ्वीवरील, विशेषतः हिंदुस्थानातील माणसांकडे किंवा ठराविक व्यक्तीकडे मेहेरबानीच्या किंवा सूडाच्या दृष्टीने पाहत असतात, ही किती अडाणीपणाची समजूत आहे, याचा विचारवंतांनी विचार करावा; आणि असल्या ग्रहांच्या वक्रदृष्टीच्या पाखड आगीची झळ शमविण्यासाठी भटांची पूजा, मारुतीची शेंदुरथापणी आणि तेलगाळणी किंवा घोड्याच्या नालापुढे डोकेघासणी इत्यादी प्रकार करणे, म्हणजे डोक्याला जखम आणि पायाला मलमपट्टी लावण्यासारखाच आचरटपणा नव्हे काय? जपजाप्य केल्यामुळे `शनि राहूची पीडा आपल्याला फारशी बाधणार नाही` या भावनेमुळे मनुष्याला एक प्रकारचा सहनशीलपणा येतो, असे म्हणतात. पण तांबड्या तावदानामुळे पांढऱ्या सदऱ्याचा रामा लालबुंद पडला, तेथे जपजाप्यामुळे तांबडा रंग किंवा त्या रंगाच्या गुणधर्माचा रामावर होणारा परिणाम रामाला थोडाच टाळता येणार? `मी तांबडा पडलो नाही` अशी नुसती भावना प्रत्यक्ष वस्तुस्थितीचे अस्तित्व किंवा परिणाम टाळण्यास सर्वस्वी नालायक ठरते.
अशी जर वास्तविक शास्त्रीय स्थिती आहे, तर शनि सौदागराचे रूप घेऊन विक्रमराजाकडे आला कसा? शनिमाहात्म्यकर्त्याने काय ही लोणकढी गप्पच झोकून दिली काय? नाही. त्रिवार नाही. तात्याजी महिपतीच्या या काव्यकल्पनेतही पुष्कळ सत्य आहे. मी ते स्वतः प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्या सत्याचे स्वरूप स्पष्ट लक्षात येण्यासाठी, निरनिराळ्या ग्रहांचे गुणधर्म विचारात घेतले पाहिजेत. जड अचेतन ग्रह पृथ्वीवर माणसांची रूपे घेऊन प्रत्यक्ष येणे जरी शक्य नाही, तरी त्या ग्रहांच्या गुणधर्मांशी त्या त्या माणसांचा प्रकृतीगुणधर्म हुबेहूब जुळता असतो, अशाच माणसाकडून बऱ्यावाईट घटनेचे आघात, ठराविक वेळी, आपल्यावर रोजच्या व्यवहारात भोगावे लागतात. प्रत्यक्ष शनि येथे येऊन कोणाला साडेसातीच्या चरकात पिळीत नाही, तर त्याच्या गुणधर्माची ज्या माणसाच्या देह मनात तंतोतंत प्रतिमा उमटलेली असेल, त्या माणसाकडूनच साडेसातीच्या छळवणुकीचे सर्व प्रकार प्रत्यक्ष व्यवहारात घडून येत असतात.
येथे विशेष लक्षात ठेवण्यासारखे तत्त्व हेच की अशी छळवणूक करणाऱ्या माणशी शनीलासुद्धा, `मी अमुक माणसावर अमुक कार्य त्याला साडेसाती आली आहे म्हणून घडवीत आहे` अशी कसलीही जाणीव असत नाही. केवळ सरळ व्यवहार म्हणूनच तो ते कृत्य करीत असतो, आणि त्या कृत्याचे परिणाम मात्र साडेसातीच्या छळणाशी समगोत्री समरसी ठरतात. फार काय, पण असली बरी वाईट कृत्ये घडविणारा माणूससुद्धा देहाने आणि मनाने हुबेहूब शनीच्या देहमनाच्या कविवर्णित वर्णनाबरहुकूमच असलेला आढळून येतो.
खगोल (ॲस्ट्रॉनॉमी) शास्त्राच्या भाषेत आकाशस्थ ग्रहांच्या निरनिराळ्या गुणधर्माचा तपशील वाचकांना कंटाळवाणा होईल. सबब, तात्याजी महिपतीने आपल्या रसाळ वाणीने बालबोध भाषेत वर्णिलेला तोच तपशील वाचकांन विचारात घ्यावा, हेच बरे. महिपतीच्या या वर्णनात कवित्व फार थोडे आहे. धन प्रत्येक ग्रहाला एकेक जात देऊन, त्याने त्यांच्या गुणधर्माची प्रचिती त्या त्या जातीच्या लोकविश्रुत स्वभावधर्माने थोडक्यात पण समर्पक चितारली आहे. (*व्यवहारात कडकडीत जातिभेदचसा काय, पण जातिद्वेष बाळगणाऱ्या परंतु घराबाहेरच्या जगात जातिविध्वंसनाच्या तोंडपाटीलक्या करणाऱ्या आचरट हिंदूनी, तात्याजी महिपतीकडे किंवा माझ्याकडे आंग्रेजी स्मृतीच्या १५३अच्या दुर्बिणीतून डोळा मारण्याचे श्रम घेऊ नये. जोवर सर्रास मनोवृत्तीची ठेवण एकजात एकसारखी बदललेली नाही, तोवर व्यवहारातले अनुभव कितीही बुरख्यात बसविले, तरी कुंभाराची सून उकीरड्यावर आल्याशिवाय राहणार नाही.*)
(१) रवि (सूर्य) Sun
रवि तो मुख्य दैवत । त्यावीण सर्वही जाणा व्यर्थ ।
नवग्रह आज्ञा पाळित । ऐसा श्रेष्ठ ग्रह हा ।।
रवि असे महाबळी । सर्वामाजी आतुर्बळी ।
प्रत्यक्ष दिसतसे नेत्रकमळी । तो हा सूर्यनारायण ।।
(२) सोम (चंद्र) Moon
सोमासी बळ अद्भूत ।
तो माळी असे म्हणवीत । वनस्पती पोषितसे ।।
तो न गांजीच कोणाशी । अति सौख्यदाता सर्वांसी ।।
(३) मंगळ Mars
मंगळग्रह हा महाक्रूर । जैसी का ते खङ्गाची धार ।
तयाचा नकळे पार । सर्व ग्रहांमाजी वरिष्ठ हा ।।
मंगळ ग्रह सोनार । क्रूरता जयाची अति थोर ।
परि तो पूजकासी कृपाकर । मंगल करी सर्वदा ।।
(४) बुध Mercury
बुध जातीचा असे वाणी । नवग्रहांत शिरोमणी ।
बुधग्रह आहे ज्यास नीट । त्यास सर्व मार्ग सुचती सुभट ।।
बुधाची बुद्धि भारी । कोणासी निष्ठुरता न करी ।
संसारचिंता हरी । प्राणिमात्राची ।।
(५) गुरू Jupiter
गुरू जातीचा असे ब्राह्मण । सर्वात श्रेष्ठ असे वर्ण ।
गुरू असे ज्ञानाचा पुरा । तयाच्या साम्यासि नसे दुसरा ।।
त्यापुढे नुरेचि थारा । कल्पनेचा कदाही ।।
(मात्र चित्पावन ब्राह्मण नव्हे. ह्या प्राण्यांनी शनीची भूमिका घेतलेली आहे, हे महाराष्ट्रात तरी कोणाला नव्याने सांगणे नको.)
(६) शुक्र Venus
शुक्र ग्रह असे बहु भला ।
जेणे राक्षसां उपकार केला । संजीवनी मंत्रे करोनी ।।
शुक्राची शक्ती आहे फार । तो करी कर्माकर्माचा चूर ।।
शुक्रपूजनीं ते तत्पर । त्यांच्या शौर्यासि नाही पारावार ।।
(७-८) राहू, केतू
हे उभयता अति अद्भुत । दैत्यकुळीचे असती ।
मातंग जातीचे दोन्ही । दुष्टक्रिया म्हणवोनी ।।
त्यांच्या दर्शने चंद्रसूर्य गगनी । चळचळा कापती ।।
राहू पीडी चंद्रासी । केतू तो सूर्यासी ।।
ग्रहण बोलिजे तयासी । प्रत्यक्ष दृष्टीसी दिसतसे ।।
(९) शनि Saturn
शनीश्वराची मूर्ति काळी । तो जातीचा होय तेली ।
चरण पंगु सुरत चांगली । पूजा करी काळभैरवाची ।।
(`शनैश्वरांची` असाही पाठभेद आहे तो `चरण पंगू` या वर्णनाशी जुळता आहे.) शनैश्वराची मूर्ति काळी । तो जातीचा होय कोळी ।।
चरण पंगु सुरत ढेवरी । मूर्ति खरी काळभैरवाची ।।
मला भेटलेल्या शनीचे वर्णन मी असे करीन.
कवीने फक्त तात्पर्यार्थ दर्शविलेला आहे. संस्कृतीचा बरा-वाईट दर्जा दाखविला आहे, एवढेच. प्रत्येक मनुष्याला ज्या ज्या वेळी ज्या ज्या ग्रहाची बरी वाईट दशा अनुभवणे प्राप्त असते, त्या त्या वेळी त्या त्या प्रकृतीच्या आणि संस्कृतीच्या प्रत्यक्ष माणसाकडूनच सुखदःखाचे किंवा लाभहानीचे आघात त्या मनुष्यावर होतात. उदाहरणार्थ, शनिग्रहाचा तडाखा आला म्हणजे शनीच्या प्रकृती धर्माशी ज्या व्यक्तीचा प्रकृतीधर्म अगदी जुळता असतो, अशाच व्यक्तीकडून आपल्याला व्यवहारात फार त्रास होतो. `शनैश्वराची मूर्ति काळी` काळ्याकुट्ट कातडीच्या लोकांच्या कुंडल्या पहा. त्यात तनुस्थानी हटकून शनि असलाच पाहिजे. शनीची जात `तेली` तनुस्थानी शनि असून, ज्यांची संस्कृती आणि मनोवृत्ती तेलकट, मळकट असते, काळभैरवासारख्या अक्राळविक्राळ दैवतावरच ज्यांचा भाव असतो, किंवा त्या दैवतांचा जो प्रकृतीधर्म आहे असे आपण मानतो, तद्वत् ज्यांची मनोवृत्ती बनलेली असते, असल्याच रंगाढंगाच्या लोकांकडून शनिग्रहाच्या पीडेची कामगिरी या पृथ्वीवर पार पाडली जाते.
यशाच्या किंवा लाभाच्या बाबतीत चंद्र, बुध, गुरू इत्यादी ग्रहांच्या समान गुणधर्मांच्या लोकांकडूनच व्यवहारात आपल्याला यश लाभाची प्राप्ती होत असते. वाचक हा मुद्दा नीट लक्षात घेऊन, आपल्या दिनचर्येचे निरीक्षण करू लागतील, तर आकाशस्थ ग्रह माणसांची रूपे घेऊन पृथ्वीवर येत नाहीत, परंतु पृथ्वीवर आणि पृथ्वीवरील यच्चयावत् पदार्थमात्रावर होणारे त्यांच्या बऱ्यावाईट दशांचे परिणाम तत्त्समानधर्मी माणसाकडूनच लोकव्यवहारात कसे बिनचूक घडून येतात, हे त्यांचे त्यांनाच प्रत्ययास येऊ लागले.
माझ्या चरित्रात विक्रमराजाची कथा किती बिनचूक तपशीलाने घडून आली, याचा वृत्तांत पुढच्या प्रकरणी वाचकांस निवेदन करीत आहे. त्यावरून तात्याजी महिपतीच्या विक्रम-कथेचा गूढार्थ बराच स्पष्ट होईल.
****
प्रकरण ६ वे
विक्रमाच्या कहाणीचा स्पष्टार्थ
हा स्पष्टार्थ भी स्वानुभवाच्या पडताळ्यानी वाचकांना पटवून देणार एवढ्याच कारणाने अनेक वाचकांच्या मनात तर्ककुतकांचे काहूर माजण्याचा संभव आहे. तेव्हा, नमनालाच घडाभर तेल जळाले तरी हरकत नाही, पण मी हा मार्ग का पत्करीत आहे, याचा थोडा प्रस्ताव करणे श्रेयस्कर आहे. कहाणी विक्रमाची आणि ती स्वानुभवाच्या शब्दानीच? अनुभवाचे बोल केव्हाही श्रेष्ठच. त्या बोलाची महती सिद्ध करायला ग्रंथाधार नको, श्रेष्ठाधार नको, कोणाची कसलीही मध्यस्थी नको. जे स्वतः पाहिले, चाखले, अनुभवले आणि अखेर `का? कसे?`च्या कसाला लावून त्याचे सिद्धांत पडताळून पाहिले, तेच वाचकांना निवेदन करणे श्रेयस्कर होय.
असे करण्यात मोठेपणा मिरविण्याचा किंवा लोकमान्यतेचा मुलामा चढवून घेण्याचा मजवर आरोप करणाऱ्या मित्रांनी मी पुन्हा एकदा या ठिकाणी नम्रतापूर्वक बजावून सांगतो की बाबांनो, मी या दोनही गोष्टीवर एकदाच कायमचे थुंकून ठेविले आहे. शिवाय, मी जसा मला स्वतःला पूर्ण ओळखू शकतो, माझ्या गुणदोषांची छाननी करून त्याजबद्दल जाणीव ठेवू शकतो, तसा या जगात दुसरा कोण असू शकेल? इतरांचे मजविषयी अभिप्राय अक्षरश: एकांगीच असणार. त्यांना माझ्या अंतरंगाचा ठाव कशाने लागणार? फार काय, पण या अंतरंगाचा नकाशा यथातथ्य रंगविण्याचा मीच स्वतः जरी प्रयत्न केला, तरी तो कितपत साधेल ह्याची शंकाच आहे, तथापि संदिग्ध आणि त्रोटक चित्र जरी असले, तरी ते माझे मीच काढलेले असले, म्हणजे टीकाकारांची तेवढीच माथेफोड कमी होऊन, वाचकांना त्याबद्दल हवा तो बरावाईट दृष्टीकोन पत्करण्यास संकोच वाटणार नाही.
शरीराने मी जात्याच दुबळा असलो, तरी मनाने मी अचाटकर्मा क्रांतिमुमुक्षु आहे. मानधनप्रभुत्वाचा मी कट्टा भोक्ता असलो, तरी लौकिकी मानधनप्राप्तीच्या मोहिनीपुढे मी आपले नपुंसकत्व अनेक महत्त्वाच्या प्रसंगी बिनशर्त कबूल केले आहे. अनेक राजे महाराजांच्या ताटाला ताट न् पाटाला पाट भिडविण्याचे शेकडो योग अनुभवूनसुद्धा, अखेर मी आणि माझी लेखणी, ह्या पलीकडे माझ्या लौकिकी भाग्याने विशेष मजल न मारण्याचे कारण तरी हेच. माझ्या मातोश्रीच्या दुधात लाळघोटेपणाचे दो थेंब जरी परमेश्वराने मिसळले असते, तरी त्या वेळी मी धनकनक संपन्नतेच्या गरमागरम उबाऱ्यात सुरक्षित बसून, इतर शेकडो झब्बूयमाणे मनाला केवळ विरंगुळा म्हणून लोकहितवादाचे नाटक खुशाल नटवीत असतो. अडाणी रयतेच्या रक्ताच्या वंगणावर आपल्या लोकमान्यतेचे आणि राज्यमान्यतेचे श्रीमंती थोर थरारविणाऱ्या झब्बू लोकांशी, आणि सरकारी नोकरीच्या क्षेत्रात हिंदी कामगारांना `डॅम सिली डाँकी अस` वगैरे निवडक पुष्पांजली वाहण्यातच राज्यकर्तृत्वाची मिजास मिरवणाऱ्या गोऱ्या अंमलदारांशी, किंचित गिळते मिळते घेऊन, माझा कार्यभाग व्यवहारी चातुयनि मी सावरून घ्यावा, असा उपदेश अनेक संसारी मित्र मला आजही करतात; पण तो मला क्षणभरसुद्धा पटत नाही. माझ्या पिंडालाच तो धर्म पारखा आहेसा दिसतो, त्या माझा काय इलाज? मग ते मित्र निराशेने म्हणतात की, "ठाकरे, हा तुमचा ग्रहयोग!"
`कै भौज्य नाना परी । कै कौरड्या भाकरी` हा तर माझ्या जीवनक्रमाचा ट्रेडमार्कच आहे आणि त्याचा मला मोठा अभिमान वाटतो. चडफड नाही. सुखदुःखाची चरचरीत फोडणी नाही, स्तुती-निंदेची तुफाने नाहीत, असले भेंड्याच्या भाजीचे मिळमिळीत, गिळगिळीत एकमार्गी ऐदी जीवन मला साफ नको. अनेक पूर्वजन्मांचा कर्मसंग्रहाचा माझा ठेवा यथातथ्य उमगणे मला शक्यच नाही. पण सामान्यतः जीवनक्रमात माझ्या आचार-विचार-यंत्रावर क्षणोक्षणी ज्या चैतन्याच्या लहरी (व्हायब्रेशन्स) आदळत असतात, त्यावरून मी असे स्पष्ट म्हणू शकतो की माझा पिंड क्रांतिकारकाचा आहे. शांतीपेक्षा मला क्रांतीचा घोसरा फार. कोणत्याही कार्याच्या भरतवाक्यासाठी भारतीयांनी ओम शांतिः शांतिः शांतिः असा उद्वार न काढता ओम क्रांती: क्रांति: क्रांति: असा उच्च ध्वनि काढावा असे मला नेहमी वाटते.
माझ्या इतका कडवा प्रयत्नवादी, खटपट्या आणि धडपड्या माझा मीच, असे गवने नव्हे, पण आत्मविश्वासाने म्हणतो. आत्मविश्वास हेच माझ्या जीवनाचे भांडवल आहे. त्याच्याच जोरावर मला शक्य ते मी आजवर केले आहे आणि पुढे आमरण करून, स्वाध्याय उद्योग आणि आशावाद या त्रयीच्या जोरावरच मी आपले वर्तमान अस्तित्व कमावलेले आहे.
God above and Heart within
माथ्यावरी देव । अंतरी दृढ भाव ।।
या सूत्रावर मी आपले चरित्र आणि चारित्र्य हालवीत असतो. मी माणसांचा भरवसा कधीच धरला नाही. माझे जिवाचे जानीदोस्त म्हणजे ग्रंथ. त्यांच्या संगतीनेच माझ्या जीवनात प्रबोधन होत आलेले आहे. त्यांच्याच तेजस्वी प्रोत्साहनाने प्रयत्नांची कडेलोट शिकस्त करण्याची प्रवृत्ती माझ्यात बळावलेली आहे. पण ४३ वर्षांपैकी गेल्या ३० वर्षांचा माझा आयुष्क्रमाचा नकाशा - विशेषतः गेल्या पाच, साडेपाच वर्षांतील क्रांतिमय जीवनातली अनेक भयंकर स्फोटांचा संकटपट तपासला असता, प्रयत्नवादालाही काही सीमा आहे; केवळ यत्नच ध्येयाची अखेर साधतो असे नव्हे;
मानवी प्रयत्नांच्या पलीकडे काहीतरी अनेक गूढ शक्ती आहेत, मग त्यांना दैव म्हणा, ग्रहदशा म्हणा, ईश्वरी सूत्र म्हणा, का आणखी हवे ते नाव द्या, त्या शक्तीचे सामर्थ्य आकलन करून, त्यांचा प्रयत्नवादात एकजिनसी मिलाफ करून घेतल्याशिवाय माणसाचा एकांडा प्रयत्नवाद फोल आहे; गंगानदीत केवढीही प्रचंड जलसमृद्धी असली, तरी ज्याच्या त्याच्या भांड्याच्या मापाइतकेच पाणी त्याला घेता येते; कर्तव्याच्या कल्पनेची भरारी आकाशापलीकडे नेली, ती प्रत्यक्ष व्यवहारात तक्तपोशीला हात लावताना पायाखाली उंच घडवीचीच घ्यावी लागते; इत्यादी अनेक विचारांचे समुद्रमंथन करून, मी शनिमाहात्म्याचे केलेले सत्यशोधन वाचकांच्या सेवेला रुजू करीत आहे. विक्रमराजाची कहाणी बऱ्याच शक्य तपशिलानी माझ्या आयुष्यक्रमात किती हुबेहूब घडलेली आहे, इकडे आता वाचकांनी लक्ष द्यावे.
विशेष सूचना : खालील हकिकतीत जेथे शनि, राहू अशी नावे येतील, तेथे तेथे शनिग्रहाचा गुणधर्म, राहूग्रहाचा गुणधर्म असाच अर्थ वाचकांनी घ्यावा. त्याचप्रमाणे या कथानकात ज्या इसमांची नावे सत्यकथनार्थ मला घेणेच प्राप्त आहे, ते सर्व माझे मित्रच आहेत. त्यांचे माझ्याविषयी ग्रह (समजुती) काहीही असले, तरी त्यांच्याविषयी माझे ग्रह (समजुती) अजूनही शुद्ध आणि अभ्रष्ट आहेत. शनिग्रहाचे साडेसातीचे तात्पुरते ऐहिक नाटक नटविण्यासाठी ह्या माझ्या मित्रांकडून व्यावहारिक दृष्ट्या ज्या बऱ्या वाईट गोष्टी घडल्या, तो केवळ नट नात्याने त्यांना घेणे भाग पडलेल्या भूमिकांचा परिणाम आहे, असे मी मानतो. जग ही एक रंगभूमीच आहे. त्यावर आपणा सर्वांना वेळोवेळी नाना प्रकारची सोंगे घ्यावी लागतात.
शत्रूला मित्राची भूमिका वठवावी लागते. मित्रावरही शत्रुत्वाने वागण्याचा प्रसंग येतो. रस्त्यावरील अपरिचित मनुष्यसुद्धा ऐन प्रसंगी पाठच्या भावापेक्षा आणि पोटच्या मुलापेक्षा विशेष ममत्वाने आपल्यासाठी प्राणार्पणही करतो; आणि ज्याचा कधी जन्मात बरावाईट संबंध आला नाही, असा मनुष्य एकाकी अवचित पुढे येऊन, एकाच प्रतिकूल शब्दोच्चाराने आपल्या कार्यात मार्गी कालवतो. पुन्हा, परिस्थितीचा देखावा बदलताच किंवा नाटकच संपूर्ण होताच, हेच सर्व नटमित्र उलट रंगांत रंगलेले दिसतात. तात्पर्य, मजवरील शनीच्य साडेसातीच्या नाटकातील नटांवर मी कसल्याही बऱ्यावाईट गुण-दोषांचा आरोग करू इच्छित नाही.
मी सर्वांना हितचिंतक मित्र या एकाच दृष्टीने आज पाहते आणि आमरण पाहीन. कोणतीही परिस्थिती चिरकाल कायम टिकत नाही. जगाचा सर्व व्यवहार म्हणजे धावत्या काळाचे घावरे देखावे होत. प्रत्येक नट आपापल्या व्यवहाराची भूमिका सरळच वठवीत असतो. त्यात त्याचा हेतू स्वार्थी असला तरी अव्यवहारिक मुळीच नसतो. स्वार्थ कोणाला तुटला आहे? मलाही तो सुटलेला नाही. अशा भिन्न भिन्न हेतूंच्या झटापटीनीच या जगद्रंगभूमीवरील व्यवहाराची नाटके अखंड रंगत असतात. या नाटकातील मर्माचा ठाव पाहताना प्रत्येक नटाच्या भूमिकेतील वर्म यथातथ्य शोधन करणे, हेच प्रत्येक सत्यशोधकांचे कर्तव्य आहे. मी भूमिकांचे पृथ:करण करीत आहे. व्यक्तीच्या गुण-दोषांचे सिद्धांत ठरवीत नाही.
मी शनीची कुचाळकी कशी केली
चंद्र सूर्याला ग्रहण लागण्यापूर्वी त्यांच्याविरोधी राहू केतूचा `वेध` प्रत्यक्ष ग्रहणापूर्वी बराच वेळ लागलेला असतो. तद्वत शनीने मला साडेसातीची धमकी देण्यापूर्वीच त्याचा वेध वर्ष दीड वर्ष आधी माझ्यावर लागलेला असावा, सरकारी नोकरीच्या घवघवीत सौभाग्याचा मळवट लागलेला असतानाच, तारीख १६ ऑक्टोबर १९२१पासून `प्रबोधन` पाक्षिकाची सुरुवात केली. १६ डिसेंबर १९२१पासून `मानसिक दास्याविरुद्ध बंड` ही लेखमाला सुरू झाली आणि तिवा ५वा अग्रलेखांक ता० १ मार्च १९२२ला प्रसिद्ध होण्यापूर्वीच ता० १० फेब्रुवारी १९२२ रोजी दुपारी बरोबर १२ वाजता राहू, शनि आणि मंगळ या त्रिकुटाचे मेतकूट जगताच, अपमानाच्या क्षुलुक सबबीवर मी ताडकन् सरकारी नोकरीच्या दास्याची जाडजूड रौणशृंखला तोडून तज्जन्य मानसिक दास्याविरुद्ध प्रत्यक्ष बंड केले.
या अपमानाला कारण झालेली व्यक्ती राहूच्या गुणधर्माची असून, त्याच मातंगलीला अजूनही पुष्कळ मेढरे हिंदी कारकुंडे `केवळ पोटासाठी` निमूटपणे सहन करीत आहेत. अपमानाच्या प्रतिकारार्थ राहूला मी वापरलेली भाषा विक्रमाच्या पाळीपेक्षा बरीच कडक होती ज्योतिषांच्या गणिताप्रमाणे त्या राहच्या जोडीला शनि आणि मंगळ असल्यामुळे, माझ्या प्रतिकाराच्या भाषेची त्यांनी समसमान वाटणी केली असावी खास सरकारसेवेचा राजीनामा देऊन जनसेवेचे प्रतिज्ञाकंकण मी हाती चढवून, दादर येथे `स्वाध्यायाश्रम` संस्था उघडली आणि प्रबोधन व हुंडा विध्वंसन या दोन कार्यात मी मग्न झालो. संसाराची काळजी श्रीहरीच्या चरणी वाहिली; आणि आश्चर्याची गोष्ट हीच की श्रीहरीने प्रबोधनाचे आणि माझे कोठे काहीही कमी पडू दिले नाही.
पडतां जडभारी । दासी आठवावा हरी ।।
मग तो लागू नेदे शिण । आड घाली सुदर्शन
ही तुकोबाची स्वानुभवाची ग्वाही, आणि
`Our happiness is in the power of One, who can bring it about a thousand unforeseen ways that mock our foresight.` ही गोल्डस्मिथकृत व्हिकार ऑफ वेकफील्डची वाणी मी या स्वाध्यायाश्रमाच्या काळात पूर्ण अनुभवली.
मागणे लइ नाही लइ नाही । पोटापुरते देई ।।
संसाराच्या विवंचनेचे वर्तुळ एवढ्याच बिंदूवर आणल्यामुळे, आणि ते आणण्यात व तज्जन्य सर्व अडचणी मोठ्या उत्साहाने, धैवनि आणि विशेषतः संतोषाने सहन करण्यात माझ्या संसारदेवतेने व लहान मुलींनी मला प्रेमाने सहाय केल्यामुळे एक वर्षांचा काळ सुखासंतोषात पार पडला. पण माझ्यावर चिडलेला (निरयनाप्रमाणे धनु राशीचा आणि सायनाप्रमाणे मेष राशीचा) शनि आपल्या साडेसातीच्या नाटकातील पात्रे शोधून रंगविण्यात गुंतला होता. शनीची एक मौज असते. तो कधी कोणाला ठार मारीत नाही. त्याला आदळ आपट छान साधते. त्यासाठी तो प्रथम मनुष्याला वर उंच नेतो आणि लगेच खाली आपटतो. ने उंच, आपट खाली दाखव भरभराट, लाव घरघराट आज राव तर उद्या रंक, आज प्रतिष्ठेला चढवील, तर लागलीच अप्रतिष्ठेच्या चापात दाही दिशांनी नडवून रडवील; अशी शनीच्या छळणाची तन्हा आहे.
त्याप्रमाणे, १९२२च्या जुलै महिन्यात प्रबोधनाचे एक वर्गणीदार के० आत्माराम केशव चित्रे, मुंबई, याजकडून अवचित आणि आवचित मला भेटीचे आमंत्रण आले. भेट होताच प्रबोधन १०१ रुपयांची उत्तेजनार्थ देणगी देऊन, "तुमच्या या प्रबोधन कार्यासाठी स्वतंत्र छापखान्याची जरूर आहे. तुम्ही एखादा उत्तम छापखाना विकाऊ असल्यास शोध करा. मी पाच ते पंधरा हजारपर्यंत रक्कम खर्चायला तयार आहे.” असेही त्यांनी आश्वासन दिले. इतकेच नव्हे तर माझ्या बरोबर आणि स्वतंत्र रीतीने रा० चित्रेही छापखाना शोधण्यासाठी मुंबईभर भटकू लागले. मला वाटले शाहू महाराज छत्रपतीच्या अकल्पित मृत्यूमुळे ठार झालेला माझा छापखान्याचा पवित्र संकल्प आता खास वाढीला लागणार! आणि तो लागलाही. कै. शाहू छपती करवीरकर यांच्या मनात पुण्यास एक मोठा अपटूडेट छापखाना काढावयाचा होता.
त्याच्या एस्टिमेटाची वाटाघाट एक वर्षभर मजबरोबर त्यांनी केली आणि सुरुवातीचे भांडवल ४० हजार (२० हजार देणगी आणि २० हजार बिनव्याजी कर्जाऊ) देण्याचा बेत कायम ठरला होता. इतकेच नव्हे तर ५ मे १९२२ रोजी रात्री ११ वाजता मला खास भेटीला बोलावून `मी उद्या सकाळी कोल्हापुरात जातो. तू ४-५ दिवसांनी तिकडे ये आणि रक्कम घेऊन जा. आता या कामाला दिरंगाई नको.` असे सांगितले. मी घरी परत आलो, सकाळी ८ वाजता निजून उठतो सर्वत्र बातमी की `शाहू छत्रपती वारले!` पण ही सुद्धा शनिचीच एक माया आहे, हे मला त्यावेळी कसे कळावे? पाच सहा महिने भटकंती करून रा० चित्रे यांनी एकदम एक दिवस थॉर्न्स कंपनीचा छापखाना खरेदी केला. मला मुळीच दाद दिली नाही. छापखाना काळबादेवी तार हापीसच्या गल्लीत आणून नीट उभा केला. पूर्वीचेच जुने कामगार नेमले आणि स्वारी मोटार घेऊन अवचित स्वाध्यायाश्रमात आली व मला मुंबईला घेऊन गेली.
"हा छापखाना, हे कामगार आणि तुम्ही. आता काय पराक्रम दाखवायचा तो मी माझ्या वचनातून गुटलो. एक वर्षभर पडेल तो मालवी पुढे तुमचे तुम्ही पहा." मला मोठा आनंद झाला. मी नियमाने छापखान्याचा धंदा मालवू लागलो. कामे मिळण्यासाठी मुंबईभर भटकू लागलो. जेमतेम एक महिना होतो न होतो, तोच एकदम आत्मारामजी चित्रे आजारी पडले आणि न्युमोनिया होऊन चार-पाच दिवसातच स्वर्गवासी झाले. आता पुढे काय? सर्व मामला खलास त्यांचे धाकटे दोन भाऊ एकदम बेलीफाच्या ऐटीने छापखान्यात येऊन बसले. त्यापैकी दत्तोपंत यांनी `पुढे कसे काय करायचे?` असा सरळ प्रश्न तरी टाकला, पण दुसरा तरुण मॅज्युएट अण्णासाहेब याने तर `Who are you here` (तू येथे कोण?) असा उर्मट सवाल टाकून आपली विद्वत्ता पाचळली. `मी येथे कोण?` या प्रश्नाचे उत्तर देणारा स्वर्गवासी झाला.
त्याचा माझा ऋणानुबंध आणि ठरलेले बातबेत त्याच्या मृत्यूबरोबरच मेले. मला आता `छापखाना नको न् तुमची कटकटही नको` असे स्पष्टोत्तर देऊन तात्काळ नगिनदास मेहता आणि गुप्ते सॉलिसिटरांच्या ताब्यात छापखान्याचा सर्व चार्ज देऊन मी मोकळा झालो. पुनरागमनाचा! पुन्हा आमची स्वारी स्वाध्यायामाच्या ईझीचेअरमध्ये स्वस्थ! शनीने पटकन् थोडे वर उचलून चटकन् थवाडदिशी खाली आदळले. दुःखात सुख एवढेच की यानंतर मध्यंतरी राहूकेतू बंधू स्वाध्याश्रमात माझी हाडे प्रत्यक्ष चेचण्याचा जरी मातंगी प्रयत्न केला, तरी त्या वेळी मंगळ माझा जानीदोस्त असल्यामुळे राहूकेतूचा अमंगळ उद्देश तडीला गेला नाही. तरीही त्याचा व्हायचा तो दुष्परिणाम झालाच. त्याचवेळी श्रीयुत रामानंद चतर्जी, संपादक मॉडर्न रिव्हूय, कलकत्ता, यांच्या विनंतीवरून अलाहबादचे माझे परमस्नेही मेजर बसू यांना `स्टोरी ऑफ सातारा` पंचासाठी ऐतिहासिक साहित्याची मी मदत करीत होतो आणि त्यान संधीत त्याच विषयावर मराठी `शंभर वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र` ग्रंथ लिहिण्याच्या खटपटीत होतो.
परंतु राहूकेतूच्या निष्कारण हल्यामुळे माझ्या मनोवृत्तीवर इतका आघात झाला की तो ग्रंथ आजपर्यंत नेटाने लिहून पूर्ण करण्याची प्रेरणाच मला होत नाही. सातारचे पापग्रहच साताऱ्याच्या कहाणीला नटले! मी तरी काय करणार? ("शंभर वर्षापूर्वीचा महाराष्ट्र` ऊर्फ हिन्दवी स्वराज्याचा खून या ग्रंथाचे ऐतिहासिक साहित्यच छापले तर अजमासे ३०० पाने भरतील आणि विवेचनाला आणखी ५०० लागतील. एवढा ग्रंथ छापून त्याच्या हजारो प्रती अवघ्या ८ आण्यात गोरगरीब शेतकऱ्यालाही सहज विकत घेता याव्या या उद्देशाने के० शाहू छत्रपती महाराजांकडून १० हजार रुपयांचे अभिवाचन मिळालेले होते. त्यांच्या मृत्युमुळे अर्थातच या उद्देशाचाही मृत्यू झाला. गुदस्त साली विद्यमान दिवाण प्रो० अण्णासाहेब लठ्ठे यांची भेट झाली. या ग्रंथाबद्दल थोडी चर्चा झाली. त्यात `सध्याच्या महाराजांना या विषयाची मुळीच काही आवड नाही. त्यांच्या अत्यंत आवडीचा विषय म्हणजे घोड्यांच्या शर्यती` इतकाच निष्कर्ष निघाला. तात्पर्य, हे प्रचंड ग्रंथाचे काम मला स्वतः लाच स्वावलंबी मार्गाने केव्हा तरी पुरे करणे प्राप्त आहे. श्रीहरी मार्ग दाखवील तसे पुढे जागे, एवढेच मला समजते.*)
सौदागर घोडा विकायला येतो
१९२२च्या एप्रिलात साताऱ्यास शिवजयंती निमित्त मी तीन व्याख्याने देण्यास गेलो होतो. त्यावेळीपासून सुप्रसिद्ध कट्टे सत्यशोधक रा० भाऊराव पाटील यांचा माझा जो अकृत्रिम स्नेहसंबंध जडला, तो आजदिनपर्यंत अखंड आणि निर्मळ आहे. फार काय पण, भाऊरावाच्या मुळेच जरी सातारच्या कूपरशाहीच्या भट्टीत मी न भूतो न भविष्यति असा तळला पोळला गेलो, तरी भाऊरावबद्दल कसल्याही प्रकारचा विकल्प माझ्या सदसद्विवेक बुद्धीला अजून तरी शिवलेला नाही, पण मौज काय पहा की सौदागराची भूमिका वठविण्यासाठी शनीने भाऊराव पाटलाचीच योजना केली. त्याच्या तनुस्थानी शनीचे बिऱ्हाड असल्यामुळेच बहुतेकरून ही योजना झाली असावी. सौदागराने दोन-तीन योजनांचे घोडे बरोबर आणले होते.
माझी उत्तम घोड्याची कल्पना म्हणजे छापखाना. अखेरीस एक दोन घोड्यांचे परीक्षण करून, अखेर कूपरच्या भागीदारीत छापखाना हा घोडा मी पसंत केला. त्यावर मी बसता क्षणीच दादरच्या स्वाध्यायाश्रमातून मी जो उडालो, तो कुलाबा, ठाणा आणि पुणा हे तीन जिल्हे ओलांडून थेट सातारा जिल्ह्यातील पाडळीच्या मैदानात उतरलो. स्वाध्यायाश्रम म्हणजे दादरच्या सर्व नवमतवादी तरुणांच्या चळवळीचे केंद्र होते. गोविंदाग्रज मंडळ येथेच, हुंडाविध्वंसक संघ येथेच थोर वीर कवी जनांचे स्मृतिदिन साजरे व्हायचे येथेच, साप्ताहिक व्याख्याने, प्रवचने, कलावंत, गवयी, कसबी यांचे गुणदर्शन, गणपत्युत्सव, काय वाटेल ते साध्वायाश्रमातच साजरे होत असे. मीच अवचित दादर सोडताच आश्रम बंद झाला, चळवळी थंडगार पडल्या. तरुणांच्या संघशक्तीची फाटाफूट झाली, सगळेच वाटोळे झाले.
पाडळीच्या मैदात घोडा उतरताच विक्रमाला जसा घोडा, नदी, झाडझुडपे गुप्त झाल्याचा देखावा दिसला, तसा मला भाऊरावने वर्णन करून सांगितल्यापैकी एकाही सवलतीचा तेथे थांग लागेना. सगळेच कविवर्णन किंवा भुसावळच्या चिट्ट्याचा अनुभव आला. पण करायचे काय? `तुमच्याकरिता घर बांधून तयार आहे.` असे स्पष्ट पत्र असताही तेथे मजुरांच्या झोपड्यात एकीत आमची व्यवस्था लागली. खाणावळीची सोय नाही, जेवण करायला बाई किंवा बुवा नाही, सगळाच ठणठणाट आलीया भोगाशी दूरवर नजर देऊन सादर झालो. विक्रमाला तामलिंदा नगरी लाभली. मला तामसनिंदा पाडळी लाभली. विक्रमाला वैश्य सावकार भेटला, मलाही कूपरच्या रूपाने तोच भेटला.
कूपरच्या कारखानी । नांगर धडे घणाघणी ।।
त्याने मला माणूस जाणोनी । आदर केला तयाचा ।।
परस्परांनी एकमेकांच्या आचार विचाराचा मेळ बसवून घेतला. ती वेळ १९२३च्या कौन्सिल इलेक्शनच्या हंगामाची होती. इलेक्शनच्या स्वयंवरात ब्राह्मणेतर पार्टीतर्फे दोन उमेदवार उभे रहावे, असा पार्टीचा दंडक. पण दंडकाला दंडा दाखवून उभे राहिले तिघे नवरदेव. कूपरला शह जाधवरावाचा आणि आवरेकराला मोर्चा दोघांचा.
त्या वैश्याची मानस कन्यका । तिचे नाव भांडवलिका ।
तिचा पण हाचि देखा । पिता इलेक्शनी यशवंत ।।
पैसा त्याचा परमेश्वर । पारशी शोध करी निरंतर ।
लेखणीचा नसता आधार । पैसा पंगू इलेक्शनी ।।
मला भेटला हा लेखकू । गरजवंत आणि लायकू ।
भांडवलिकेशी जखडून टाकू । कशास कां कूं करील पै ।।
इलेक्शनच्या धामधुमीच्या षड्रस मेजवान्या झडल्या, डावपेचाच्या झटापटी घडल्या आणि छापखान्यातून मॅनिफेस्टो हँडबिलाच्या लक्षावधी बातेऱ्या धडाडल्या. अखेर कूपर वैश्याचा `हत्ती` जाधव क्षत्रियाच्या `घोड्या`च्या जोडीनेच कौन्सिलाभिमुख झाला.
कौन्सिल इलेक्शनचा सत्यशोधकी जलसा आटोपताच, माझ्या छापखान्याचा व्यवसाय आस्ते आस्ते चालू लागला. विशेष तपशील न देता, एवढे म्हटले म्हणजे पुरे की या पुढील सात आठ महिन्यांच्या अवधीत मी भांडवलशाहीच्या सपशेल पचनी पडावे, यासाठी अनेक प्रत्यक्षाप्रत्यक्ष प्रयत्न करण्यात आले. अखेर एके दिवशी
पारशी म्हणे केशवासी । चला मोटारीत फिरावयासी ।।
अति रम्य फळबागेशी । तेथे सर्व विदित होईल ।।
फळबागेत काय पडले हे वाचकांना विदित करण्याचा प्रसंग हा नव्हे. परंतु भांडवलशाहीच्या बाह्य झकपक लखाकीच्या आत काय किंमतीचे ब्रह्मांड असते, याचा मला तेथे निश्चित चांग लागला आणि मी निषेधपूर्वक त्याचा धि:कार केला.
भिंतीचा निर्जीव हंस हाराची मोत्ये खातो
विक्रमाने अलौकिकेच्या आकर्षणाचा जितक्या जाणत्या अजाणेतपणाने इन्कार केला तितक्याच खुबीने भांडवलशाहीचे मला पचनी पाडण्याचे डाव मला हुकवावे लागले. हो ला हो ठोकून मी भविष्यावर शोधन-प्रकाश पाडीत होतो. बाह्यत्कारी मी कितीही उमेद दाखविली, तरी अंतर्यामी मी फार निराश बनलो होतो. पाडळी म्हणजे माझ्यासाठी अक्षरश: तामसनिंदा बनली. माझा माणसांवरील विश्वासच उडाला. सारे जग मला मधुमुख विषगट दिसू लागले. ठाकरे आपल्या पचनी पडणे शक्य नाही; उलट आपल्या धोरणात आणि कारणात हा जोड्यातल्या खड्याप्रमाणेच सलणार, ही भांडवलिकेची खात्री पटल्यामुळे; तिलाही माझे अस्तित्व जड वाटू लागले.
भाऊराव पाटलाला हे दोन्हीही परस्परविरोधी देखावे स्पष्ट दिसत होते; पण त्याची प्रकृती शनीच्या पकडीत असल्यामुळे, धड त्याला एकही बाजू धरता येई ना. केव्हा तरी बॉम्बचा स्फोट होणार, ही सर्वांची खात्री होती. पण त्याच्या कर्तेपणाचा अग्रमान घ्यावा कोणी? मृत्यूसुद्धा माणसाच्या किंवा कोणाच्याही मरणाचे पाप आपल्या माथ्यावर न घेता. कोणत्या तरी लहान मोठया रोगाच्या टाळक्यावर ते थापतो. मग येथे तर काय? धोरणी भांडवलशाही आणि तापट ठाकरे, असा मामला! उघड घटस्फोटांची प्रथम कोणी मारावी एवढाच काय तो प्रश्न उरला होता.
इकडे शनीने पुण्यात एक अकल्पित घटना घडविली. बुध आणि गुरूवर शनीने आपली छाया टाकली. माझे परम जिव्हाळ्याचे स्नेही, प्रबोधनचे सहसंपादक आणि अनन्य भक्त स्वर्गवासी रामचंद्र वामन ऊर्फ बापूसाहेब चित्रे. बी० ए०यांना पुण्यास स्वतंत्र प्रबोधन छापखाना स्थापन करून, प्रबोधन पाक्षिक तेथे स्वतःच्या जबाबदारीवर पण माझ्याच संपादकत्वाखाली चालविण्याची प्रेरणा झाली. त्यांनी एक विकाऊ छापखाना सहजगत्या हेरला आणि अवचित एके दिवशी एका गोडवा भटाला घेऊन बापूसाहेब पाडळीला आले. हा गायतोंड पुणेरी भट म्हणजे शनीने निर्माण केलेला `भिंतीचा निर्जीव हंस` असून तो लवकरच सजीव होऊन माझ्या व्यवहाराची `मोत्ये` मटामट मटकावील, अशी आम्हा कोणालाच कल्पना येणे शक्य नव्हते.
हा निर्जीव हंस ज्या दिवशी पाडळीला आला, त्याच दिवशी माझी एक अपत्य हंसी मृत झाली. त्या अपत्याला मातीआड दृष्टीआड करण्यासाठी त्याच्या समाधीवर दगड ठेवीत असतानाच मी त्या पुणेरी दगडाबरोबरच, दगडाची छाती करून छापखाना खरेदीच्या वाटावरंवट्याची वाटाघाट करीत होतो. या प्रसंगी अपत्यशोकाने विदीर्णहृदय झालेल्या माझ्या सहधर्मचारिणीने `प्रबोधनापुढे पोटच्या गोळ्याचीसुद्धा यांना तिडीक येत नाही.` हे काढलेले उद्गार मी वत्सलांछनाप्रमाणे माझ्या हृदयावर आमरण धारण केले आहेत. हाच माझा व्हिक्टोरिया क्रॉस. ह्यात माझी सत्त्वपरीक्षा झाली. तत्त्वपरीक्षा पार पडली. सुख दुःख, प्रेम, आदर आणि कर्तव्य यांचा हा संमिश्र विजय होय.
`माझे नाव आणि बापूसाहेबांचे गाव` अशी सोयीस्कर अटीवर सर्व जबाबदारी पत्करून बापूसाहेबांनी पुण्याचा आयता चालू छापखाना आपल्या ताब्यात घेतला. माझे परमस्नेही सातारचे सराफ श्री. नारायण बळवंत वाळवेकर यांच्यामार्फत आणि प्रबोधनच्या शिलक फंडातून तात्पुरत्या कामचलाऊ रकमांची सोय मी बापूसाहेबांना करून दिली. पुण्यास प्रबोधन छापखाना स्थापन झाला व तशी मी प्रबोधन पाक्षिकात उघड जाहिरातही दिली. पाडळीच्या भांडवलशाही धवलगिरी वरून शनीला मला झटका देऊन खाली आदळायचे होते, म्हणून त्याने ही पुण्याच्या छापखान्याची `माया` निर्माण केली.झाले! भांडवलशाहीला कुरापतीच्या सबबीला एवढे कारण पुरे झाले. तिची बुरखेबाज कुजबूज सुरू झाली. कारस्थानांच्या पुलाव्याच्या हंड्या शिजू लागल्या. मला त्या कळत होत्या, दिसत होत्या, प्रत्यक्ष ऐकू येत होत्या. भिंतीवर चितारलेला हा निर्जीव हंस खुंटीवरील हाराचे मोत्यांचे सर गट्टायस्वाहा करीत आहे आणि या सर्व बुरख्या कारस्थानांचा माझ्यावर निष्कारण आघात होणार, याची मी पूर्ण जाणीव बाळगून होतो. पण कर नाही त्याला डर कशाला?
हे शनिदेवाचे छळण । त्याणें रचिला माया जाण ।।
काय व्हायचे असेल ते होवो. माझ्याशी प्रत्यक्ष पुराव्याचा प्रश्न आला तर त्याचा नि:संदिग्ध फडशा पाडायला मी खंबीर आहे. पण, शनिमाहात्म्यातल्या अलोलिकेला विक्रमावर प्रत्यक्ष चोरीचा आळ घेण्याचे वास्तविक जे नीतिधैर्य होते, तेवढेसुद्धा धैर्य पाडळीच्या भांडवलिकेत मला दिसून येईना. जगातील भांडवलशाहीच्या पिंडाच्या परिमाणूंचे पृथ:करण केले, तर त्यात नीतिधैर्याचा (मॉरल करेज) खडखडाटच दिसून यायचा. भांडवलशाहीचा पैसा परमेश्वर प्रतिसृष्ट्या निर्माण करण्यात विश्वामित्रालाही जरी ढोपरे टेकायला लावतो, तरी पाणबुड्याचे मरण पाण्यात, या नियमाने अखेर तो परमेश्वर पैशाच्या पाशातच पासला पडतो, हा इतिहाससिद्ध सनातन सिद्धांत आहे, आणि चालू घडीच्या जगाच्या भांडवलशाही राजकारणात (इंपिरिअलिस्टिक पॉलिटिक्स) हाच सिद्धांत जगाच्या सार्वत्रिक चळवळीत विशेषत्वाने सिद्ध होऊ पाहत आहे.
कै. बापूसाहेब चित्रे ह्यांनी पुण्यास प्रबोधनाचे नुसते नाव देऊन एक चालू आयता छापखाना सुरू करताच, ह्या भांडवलिकेने त्यावर असा खोडसाळ अर्थ बसविला की ठाकरे ह्यांनी पाडळीच्या छापखान्यातले साहित्य लांबवून पुण्यास नवीन छापखाना काढला. पण हा आरोप कोणी उघड बोले ना! माझा संताप अनावर झाला. अत्यंत गरीब कुटुंबात मी जन्मलो आणि विपन्नावस्थेची कमाल कसोटीची संकटे अनुभवून मी मला आणि माझ्या घराण्याला इभ्रतदार गृहस्थपदाला आणले; पण माझ्या दुर्दिनांच्या तुफानी काळातही माझ्यावर कोणी चोरीमारीचा अगर ठकबाजीचा आरोप कधी केला नाही. पण या ठिकाणी शनिमाहात्म्याचे नाटक वठत होते. सौदागर भाऊरावही चिडला. अखेर सर्व नाटकाचे भरतवाक्य शांतपणाने आणि चांगुलपणाने पार पडावे, म्हणून मी ताबडतोब सर्व संन्यासाच्या उद्देशाने भांडवलिकेच्या पित्याला भेटीस बोलवून सर्व परिस्थितीचा भाऊराव समक्ष स्फोट केला.
उपरोक्त `आरोपांत माझा कसलाही भाग नाही, विश्वास नाही, मला तसे दिसत नाही, वाटत नाही. खोडसाळ क्षुद्रांच्या बडबडीवर आपण विचार करू नये.` असे म्हणून पित्याने कानावर हात ठेवले. सिद्धसाधकपणाची तामसनिंदा पाडळीची यंत्रतंत्ररचना मी पूर्ण अभ्यासिली असल्यामुळे ‘आपला छापखाना, साहित्य, हिशोब, ठिशोब काय असेल नसेल ते स्वाधीन घ्या. मी आता येथे पाणी प्यायलाही राहणार नाही` असा स्पष्ट खुलासा करून, सर्व कारभाराची मी पद्धतशीर व निःसंदिग्ध चार्ज दिला आणि कफल्लक अवस्थेत पाडळीच्या शनीमाहात्म्याच्या नाट्यप्रयोगाचा एक अंक पुरा केला.
(पाडळीच्या वनवासात मी सर्वसंन्यास कसा केला, वाजवी घेण्यावर थुंकून नसत्या देण्याची प्रॉमिसरी नोट का लिहून दिली, वगैरे हकिकत मी `लोकहितवाद` आणि `प्रबोधन` पत्रात स्पष्ट प्रसिद्ध केलीच आहे. पाडळी सोडली तेव्हा मी अक्षरश: `निर्निकल` (निकेलचे नाणे) स्थितीत होतो. माझे मित्र किन्हईचे डॉ. पाटणकर व सातारचे सराफ श्री. नारायणराव वाळवेकर यांनी द्रव्यसहाय्य दिले, तेव्हा मी पुण्यास जाऊ शकलो. शिवाय, छापखान्याचा चार्जशीट, हिशोब, खरेदीपत्रकानुसार साहित्याची मोजदाद करण्याच्या कामी डॉ. पाटणकर, पंत पराडकर, दत्तोपंत देशमुख या मित्रांनी मला जे सहाय्य दिले व माझ्या चित्तक्षोभाला विवेकाचा पाठिंबा दिला, तो मी आमरण विसरणार नाही. त्याचप्रमाणे माझ्या खासगी सामानाची बांधाबांध होत असताना, त्यात नजरचुकीने जाणून अगर नेणून काही `चोरीचा माल` जात आहे की काय, हे माझ्या खास आग्रहावरून तपासण्याचे काम माझे मित्र व कूपर फॅक्टरीचे पेशवे रा. रा. बंड यांनी केले व माझ्या राहत्या झोपडीची झडती निर्दोष पाहिली, याबद्दल त्यांचाही फार आभारी आहे.)
शनीने मला खूप उंचीवर नेले आणि अवघ्या १२ महिन्यांच्या आत माझ्या सर्वस्वांचे बारा वाजवून, आपल्या पराक्रमाची मला पहिली सणसणीत सलामी दिली.
****
प्रकरण ७ वे
खास शनिग्रहाच्या अड्डयात
स्वर्गवासी मऱ्हाठी इतिहासाचार्य राजवाडे पुण्याविषयी `पुणे हा एक मोठा शेतखाना आहे.` असे उद्गार काढीत असत. हा सिद्धांत त्यांनी ऐतिहासिक दृष्ट्या ठरविला का आरोग्यशास्वदृष्ट्या काढला, हे समजणे कठीण आहे. तथापि त्यात पुष्कळच तथ्य आहे, यात संशय नाही. मी राजवाड्यांइतका पुढे न जाता, इतकेच स्वानुभवपूर्वक म्हणू शकेन की, `पुणे हा एक शनिखाना आहे.` पुण्याची नजर जेथे जेथे गेली तेथे तेथे साडेसातीचा ज्वालामुखी फुटून सत्यानाशाचा कहरच गुदरला, असा मागील आणि चालू इतिहासाचा पुरावा आहे. पुणे शहराची कल्पना आणि स्थापना शनिवारीच घडलेली असावी, असा माझा तर्क आहे. मराठी साम्राज्याची राखरांगोळी करणाऱ्या शनिखान्याच्या आद्यशनीचा वाडासुद्धा शनिवारवाडा आणि त्याच्या पेठेचे नावसुद्धा शनिवारपेठच! पुण्याच्या पेशवाईंचे पापड भाजून, सातारच्या छत्रपतींच्या सिंहासनाची राखरांगोळी करणाऱ्या बाळाजीपंत नातूशनीचे वास्तुमंदिरही याच शनिवारपेठेत.
इतर कोणत्याही शहरात अगर गावात बहुशः न आढळणारे शनीचे देऊळ फक्त पुण्यातच अग्रमान पावलेले आहे. *वसईला एक शनीचे देऊळ आहे आणि ते रास्तच आहे. रावबाजी शनीच्या मर्दुमकीचे स्मारक म्हणून पुण्याचा प्रतिध्वनी वसईला उमटला, तर त्यात चूक ती कशी?* इतर ठिकाणचे ब्राह्मणबुवा लोक, तात्याजी महिपतीच्या व्याख्येप्रमाणे, जरी गुरुग्रहाच्या गुणधर्माचे असले, तरी ह्या शिखान्यायाला एकजात ब्राह्मण हमखास शनीचा अवतार असतो. इतकेच नव्हे, पण बाहेरचा कोणीही शहाणा अथवा बावळा गुरू एकदा का पुण्याच्या शनीच्या कक्षेत आला की त्याला त्याने तात्काळ आपणासारिखा केलाच म्हणून समजावे. विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, पुण्याच्या पेठांच्या नावात सगळ्या वारांची नावे आहेत. पण त्यात ब्राह्मणी गुणधर्माच्या गुरुवार पेठेचा अज्जिबात लोप झालेला आहे.
पुण्यात सगळे वार आहेत, गंज आहे, भवानी आहे, वेताळही आहे; पण गुरू मात्र कोठेच नाही. सगळे महत्त्व शनीला! इतक्या पराक्रमी आणि तात्काळ परिणामी शनिखान्याचे स्थानमाहात्म्य सर्व ब्राह्मणेतर रहिवाशांवर थोडेफार पडल्याशिवाय कसे राहणार? आणि व्यवहाराच्या दृष्टीने विचार केला तर ज्या ब्राह्मणेतरांना शनिखान्यातल्या शनीशी हरघडी काही ना काही व्यवहार पडायचाच, तेथे त्यांना आपली मनोवृत्ती, जबरदस्ताचा टिकाव साधण्यासाठी, सवाईशनि बनविणे प्राप्त आहे. कितीही सरळ आणि सात्विक वृत्तीचा मनुष्य असो, तो शनीखान्यात गेला पुरे की त्याला शनीची बाधा झपाटल्याखेरीज राहाचीच नाही. कोणतीही लहानमोठी चळवळ घ्या किंवा चळवळ्या घ्या, तिकडे पुणेरी शनीची नजर जाताच, तिची आणि त्याची साडेसातीच्या चरकात गठडी वळलीच पाहिजे. गेल्या काळच्या मेल्या गोष्टी सोडल्या तर गणपती उत्सव काढणारा हाच शनि, आणि त्याचा भाद्रपदी शिमगा बनविणारा हाच शनि. महात्मा गांधींच्या चळवळीला हाच शनि भोवला आणि अस्पृश्यांच्या आत्मोद्धाराच्या राशीला याची साडेसाती खपाटी बसली आहे.
शुद्धीचे खानावळी ताक हाच शनी घुसळीत आहे आणि संघटनांचे थालीपीठ हाच थापटीत बसला आहे. दृक्प्रत्ययाच्या पुण्याईवर ज्योतिषशास्त्रात ढवळाढवळ करणारा हाच; आणि अखिल जनतेच्या पितरपक्षातल्या खिरीवर स्वतःची एकांडी लोकमान्य दिवाळी साजरी करणारा हाच. नवमतवाद, मग तो इरसाल भटोत्पन्न असो वा भटेतरोत्पन्न असो, त्याच्या बोकांडी पुण्याचा शनि बसला नाही, असे कधीच घडले नाही. नवमतवादी सुधारकांचा पुण्याच्या शनिखान्याने आजपर्यंत जसा आणि जितका छळ केलेला आहे, तसा आणि तितका छळ खास शनीनेही कोणाचा केला नसेल, पुण्यात बुधाच्या बुधवार पेठेला बरेच बाजारी महत्त्व असल्यामुळे, तेथील चळवळी बाहेरच्या लोकांना मोठ्या दणदणाटाच्या वाटतात. पण तोसुद्धा महाराष्ट्राच्या या शनिखान्याची एक महामाया आहे, हे पुष्कळ बावळटांच्या सहसा लवकर लक्षात येत नाही. आकाशस्थ नवग्रहात जसा शनि, तसे महाराष्ट्रात पुणे, एवढे म्हटले म्हणजे पुरे आहे.
मराठी इतिहासाच्या अध्ययनामुळे मूळपासूनच मला पुण्याचे काहीच आकर्षण नव्हते व सध्याही नाही. पुण्यात राहण्याची पाळी कधी काळी मजवर येईल, अशी मला स्वप्नातही कल्पना नव्हती. पण शनीच्या साडेसातीला अशक्य काय? मी पुष्कळ नको म्हटले म्हणून शनि थोडेच मानणार? कै० बापूसाहेब चित्र्यांना `बनवून` त्याने प्रबोधन छापखान्याचा जो `भिंतीचा निर्जीव हंस` पुण्यास निर्माण केला, त्याच्या आकर्षणाने पाडळीला सणसणीत हापटी खाऊन मी जे टाणकर उशीसरसा उडालो तो नेमका शनिखान्याच्या जबड्यात! तीन वर्षांच्या नियमित आणि सडेतोड कामगिरीने आधीच प्रबोधन पाक्षिक म्हणजे पुण्याच्या शनिदेवांच्या डोळ्यात वडसा प्रमाणे सलत होते. त्यात आता खास प्रबोधन छापखान्याचीच छावणी शनिखान्याच्या अड्डयात आल्यावर, त्यांच्या पोटात शनिगोळा का उठू नये? सगळे इरसाल शनि कावळ्यांप्रमाणे एकचित्र एकपित्त एकत्र जमले.
आधीच त्या गायतोंड्या भटाने छापखान्याचा व्यवहार म्हणजे केवळ शनीची माया करून, बापूसाहेब चित्र्यासारख्या सरळ मनाच्या तरुणाला बिनबोभाट भुरळले होते. त्या छापखान्यावर जवळजवळ २०-२५ सावकारांच्या डिकऱ्या लागल्या असतानाच, मे महिन्याच्या कोर्टाच्या सुट्टीच्या अवधीत, त्यांना हव्या त्या सवलतीने विक्रीचा विधी उरकून घेतला. म्हणजे कोर्टाच्या भट्टीत भाजले जाणारे सावकारी बटाटे परस्पर फोफाट्यातून बाहेर काढण्यासाठी, त्या भटी मर्कटाने आम्हा दोघांना मांजराच्या डावल्या बनविले. मी पुण्यास पाऊल ठेवताच हे सर्व मायावी नाटक मला स्पष्ट उमगले. आता काय करायचे? दिवाणी फौजदारीची कज्जेदलाली लढवीत बसायचे, का `अर्धम्` च्या ऐवजी `सर्वम् त्यजति पण्डितः` करायचे? `विश्वास` आणि `वचन` या दोनही चिजी धुक्याइतक्याच मायावी ठरल्यामुळे, तरुण बापूसाहेब चित्रे दिग्मूढ बनले. नाना प्रकारचे नाटकी मुखवटे घालून पुणेरी शनिदेवांच्या टोळ्याच्या टोळ्या मला उलटसुलट उपदेशाने `मदत करण्यासाठी` माझ्या बिऱ्हाडी घिरट्या घालू लागल्या.
गायतोंड्याच्या `डिक्रेटलेल्या` सावकारांनीही हाच क्रम पत्करला. प्रतिवादीचे गुप्त कारस्थान सावरण्यासाठी नकली वादाचे वकीलपत्र घेऊन खटले झुंडविणारे कित्येक झुंझार कोंबडे विश्रामबागेच्या उकीरड्यावर आरवू लागले. ज्यांचा माझा जन्मात कधी संबंध आला नाही व ज्यांची काळी गोरी तोंडे मी एकदाही पाहिली नाहीत, अशा निवडक इरसाल शनीची एक दिवस तर माझ्या बिन्हाडी मोठी शनिकॉन्फरन्सच भरली. त्यात `श्रीमंत` पदवी धारण करणाऱ्या महात्म्यापर्यंत सर्व दर्जाच्या वेदोनारायण शनीचा भरणा होता. त्या कॉन्फरन्सने मला पुणेरी भटांच्या शनिमाहात्म्याचा जो अथांग थांग लागला, त्याची किंमत दहा टाटांच्या ऐश्वर्यालाही देता देववणार नाही. पुण्यात उलटसुलट कायदेबाजीच्या भानगडी कोण कोण कसकसे चालवितात, ह्याचा मला पुरा छडा लागला.
अखेर उडदामाजी काळे गोरे निवडीत बसण्याची वांझोटी खटपट करीत न बसता, मी प्रबोधन छापखान्याचा बोर्ड काढून घेऊन, त्यावरील माझ्या नावाच्या संबंधाचा जाहीर संन्यास केला. गायतोंड्याला दिलेले पैसे, छापखाना चालविण्यात झालेला खर्च, बुडालेली बिले (त्यात एक `स्वदेश` भक्तानेच २५ रुपयांचे बिल बोलबोलता बुडविले. तपास करता हा त्याचा नेहमीचाच धंदा आहे, असा ठाव उमगला) वगैरे बाबतीत अजमासे दीड-दोन हजारांची कचकचीत ठोकर खाऊन, या `भिंतीच्या निर्जीव हंसा पायी मी सक्षौर प्रायश्चित्त घेतले. विक्रमाच्या कहाणीतला हंस हाराची मोत्ये गिळून निर्जीव चित्रावस्थेत भिंतीवर कायम तरी राहिला, पण माझ्या कहाणीतला हंस भिंतीवरूनसुद्धा साफ नाहीसा झाला.
पाडळी सोडताना पाय ठेवण्यासाठी शनीने निर्माण केलेली ही मायेची पायरी पायाखालून निसटताच मी खास शनीच्या अड्डयातच हातपाय तुटून निर्निकल (निकेल धातूची नाणी) अवस्थेत चारी मांड्या चीत पडलो. प्रबोधन बंद पडला. हातातली जीवनदेवता लेखणी सांदीला पडली. माझ्या विक्रमाचे हातपाय तोडले जाऊन मी अक्षरशः अस्तित्वातून उखडला गेलो. असून नसू सारखा झालो. पुढे काय?
आपत्तींचे आघात ग्रहांच्या दर्शने पडोत वा माझ्या व्यावहारिक मूर्खपणाने होवोत, त्यांच्या उत्पत्ती स्थिती लयाची चिकित्सा करून, प्रयत्नवादाची समशेर विशेष हट्टी आग्रहाने पाजळण्याचा माझा प्रकृतीधर्मच आहे. हट्टी निश्चयाने मी एकदा एखाद्या घटनेचा पिच्छा पुरवू लागलो की त्यात तोंड फुटले तरी माघार घेण्याचा गुणधर्म माझ्यात नाही. हातपाय तुटले किंवा कोणी माहात्म्याने तोडले तरी धुळीत लोळपाटणे न घेण्याइतका मी मर्त्य मानव नव्हे की काय? विशेषतः भिक्षुकशाही कारस्थाने हाणून पाडण्यासाठी स्वतः चे नाक कापून भटांग अपशकून करायला मी कधीच कमी करणार नाही. आदळआपट्या शनीने मला सर्वस्वनाशाच्या मसणवटीत बसवता बसवताच माझ्या जन्मजात प्रयत्नवादाचा डुक्कर मुसंडीच्या पलित्यावर एका जबरदस्त निश्चयाच्या चकमकीची ठिणगी पडून त्याला भटकवला.
मायावी प्रबोधन छापखान्याच्या पाट्या खाली उतरण्यासाठी माझा मनुष्य बापू जाधव गेला असता, काही निवडक शनिदेवांनी एक पाटी लाथ मारून खाली पाडली आणि त्यावर थुंकीमिश्रित रॉकेल ओतून ती भररस्त्यावर जाळली. शेलक्या शिव्यांच्या नांदी भरतवाक्यात `पुण्यात प्रबोधन? आम्ही जिवंत असता ही ब्राह्मणेतरी महामारी येथे? अशी जळून ख करू.` असा त्या पवित्र ब्रह्मवात्युत्पत्रांनी मोठा वेदघोष केला. सात्विक संतापने प्रबोधनाभिमानी जाधवने मला ही गोष्ट सांगताच माझा प्रयत्नवाद बेफाम फुरफुरला आणि `करीन तर ह्या शनिखान्यातच स्वतंत्र प्रबोधन छापखान्याची प्राणप्रतिष्ठा करीन.` अशी मी प्रतिज्ञा केली.
`पुण्याचे पाणी पिऊन माणुसकीवर निखारे ओतण्याइतकी माझी जीवनचर्या शनीच्या पिंडाची बनविण्याची जरी मला इच्छा नाही, तरी केवळ या इरसाल शनीच्या कृत्याचा सक्रीय निषेध म्हणून कम कमी दोन वर्षे तरी प्रबोधन छापखाना या शनींच्या छातीवर बसून चालवीन मग मला जिकडे जायचे तिकडे जाईन. पुण्यात प्रबोधन? होय पुण्यात प्रबोधन चालवून दाखवीन. ठार मेलो तरी हरकत नाही. भडाडलेल्या होळीत उभा राहून या शनीच्या शनिमाहात्म्याचे दात पाडीन, तर नावाचा ठाकरे!` या माझ्या प्रयत्नवादी महत्त्वाकांक्षेला बापूसाहेब चित्रे आणि बापू जाधव यांनी पूर्ण पाठिंबा देताच, मी स्वतंत्र छापखान्याच्या व्यवस्थेसाठी मुंबईस आलो.
मुंबईत शनीचा मायाबाजार
मुंबईस येताच भांडवलासाठी लहानमोठ्या कर्जाऊ रकमा मिळविण्याचा प्रयत्न करू लागलो. बारीकसारीक तपशील न देता, एवढे म्हटले म्हणजे पुरे की त्या माझ्या भिक्षांदेहीच्या दौऱ्यात मी एकही गरीब श्रीमंत लुच्चा सच्चा मित्र भेटल्याशिवाय सोडला नाही. या भटकंतीत मला माणसाची खरी पारख झाली. झब्बू ढब्बूंचे अंतरंग समजले. लोकहिताच्या कळकळीच्या पावशेर दुधात आत्मस्तोमाचे दीडशेर पाणी ढकलून गवळ्याचा धंदा करणारे ढवळेपवळे कोणकोण आहेत, ह्याची मी यादी तयार केली. जवळ ट्रामपुरतेही निकल नसल्यामुळे, सकाळपासून रात्रीपर्यंतची साऱ्या मुंबई शहरातली भटकंती दादरहून पायी चालत जाऊन करत असे. माझे हे वांझोटे प्रयत्न कडव्या निश्चयाने चालू असता, दुसरीकडे शनि आपल्या कारस्थानाची हंडी शिजवीतच होता. शनीचा एक गुणधर्म मी मागेच सांगितला की तो आपल्या बळीला कायमचा मारून पाडीत नाही, तर एकदा आपटतो आणि लगेच त्याला हात धरून उठवतो. त्याने पाडळीला आणि पुण्याला माझा चेंदामेंदा करून जमीनदोस्त पाडले. एवढ्याने त्याचे समाधान होणारे नव्हते. अर्थात् माझी कणीक आणखी तिंबविण्यासाठी मला हात देऊन उठविणे शनीला बागच होते; आणि हे काम त्याने इतक्या सफाईत पार पाडले की माझे मलाच अजून आश्चर्य वाटत आहे.
ह्यावेळी मला भेटलेला मानवी शनि हुबेहूब तात्याजी महिपती कृत वर्णनाचा होता. त्याने जिव्हाळ्याच्या जानीदोस्तांचा मुखवटा घालून, भांडवल जमाईच्या कामी मला कायावाचामने फार मदत केली. (कारण याच मदतीच्या सुरीने पुढे त्याला माझा गळा सफाईत चिरावयाचा होता! एका वेळचे अमृत दुसऱ्या वेळी त्याला जहर बनवायचे होते!) हातात थोडी रक्कम पडताच छापखान्याच्या सर्व सामुग्रीची गुजराथी टाईप फौंड्रीला मी ऑर्डर दिली. सर्व सामान एकामागून एक पुण्यास रवाना होऊ लागले. जेहत्ते.
इतुक्यात काय वर्तली भाव । फोंड्रीला झपाटी शनिदेव ।
ट्रेडलचे पॅकिंग सावयव । ढिले खिळखिळे घडले पै ।।
बसता आगगाडीचा धक्का । ट्रेडलचा चुरा झाला पक्का ।
फुटला आरपार खोका । मशिनरी सर्व मोडली ।।
पुण्याहून धडकली तार । ट्रेडल वगैरे मेले ठार ।
एकेका पार्टाचे तुकडे चार । आटोपला बाजार सर्वस्वी ।।
धाविन्नलो पुण्यनगरा । गोळा केला यंत्राचा चुरा ।
परत आणिला मुंबापुरा । रिपेरीस टाकला फैक्टरी ।।
शनीचा घाव नेमका वर्मावर असतो. छपाईचे साधन जे ट्रेडल तेच मोडल्यावर इतर सामुग्री काय चाटायची? प्रथमग्रासे मक्षिकापात पुरवला, पण हा प्रथम प्रयत्ने वज्राघातच झाला. तरीही धीर न सोडता किंवा निराशेने खचून न जाता, वचने मिळालेल्या भाडंवली रकमा गोळा करण्यासाठी मी भटकंती करू लागलो. एक दिवस एका झब्बूच्या भेटीसाठी कल्याणला गेलो असता, उजव्या पायात पेटका आला. कसाबसा दाबला. स्टोशनवर आलो तो एकदम उजव्या भागात आपादमस्तक तिडका सुरू झाल्या. जेमतेम दादरला घरी येऊन पडलो. पाठोपाठ डेंग्यू, कावीळ, मूळव्याध या त्रयीने जो बिछान्यात पडलो तो तब्बल चार महिने! खर्चाचे भयंकर तोंड लागलेले आणि पैशाचा पुरा खडखडाट रकमांची वचने दिलेले लोक सुद्धा थापेबाजी करू लागले. एक इरसाल `राव` झब्बूने थापेबाजीच्या बाबतीत तर माझे पुरे कल्याण केले. श्रीहरीची कृपा म्हणून मी या दुखण्यातून वाचलो; नाहीतर तोंडात तुळशीपत्र ठेवण्यापर्यंत पाळी आलीच होती.
आजार हटला, मशीनरीचे पार्ट दुरुस्त होऊन आले आणि मी अस्थिपंजर स्थितीत १९२५ जानेवारीअखेर पुणे गाठले. ताबडतोब प्रबोधनचा अंक काढण्याच्या खटपटीला लागलो. पण शनीला माझ्या उरल्या सुरल्या हाडांचे पीठ करायचे होते. प्रबोधन छापखान्याची उभारणी ज्यांच्या हिमतीवर केली, त्या श्रीयुत दत्तोपंत देशमुखांचे वडील वारल्याची एकाएकी तार आली आणि ते कायमचे निघून गेले. मशीन चांगले ‘फिटप’ केले, तरी एप्रिलपर्यंत ते सात वेळा फुटले. एकदा तर भयंकर अपघातच टळला. याकामी पैशाचा इतका चुराडा झाला की चांगल्या छापखान्यात फाटक्या खिशाचा मालक, अशी माझी स्थिती झाली.
या वेळीच ‘कोदण्डाचा टणत्कार’ ग्रंथाची दुसरी आवृत्ती लिहून प्रसिद्ध केली आणि त्यामुळे माझी सांपत्तिक स्थिती पुष्कळच सावरली गेली. प्रबोधन नियमित चालू झाला. छापखानाही व्यवस्थित बनला, आणि लव्हाळ्या युवतीप्रमाणे लक्ष्मी जरी माझ्या गळ्यात चतुर्भुज धावत येऊन पडली नाही, तरी रोजच्या मीठभाकरीची ददात तिने ठेविली नाही. मी, श्रीयुत कै० चित्रे आणि माझे विश्वासू चार कामदार, देव बुद्धी देईल तसे, एका जीवभावाने प्रबोधनकार्याचे गाडे रेटीत होता. अल्पसंतोष हाच आमच्या जीवनाच्या वाटाड्या असल्यामुळे, सुक्या ओल्या भाकरीचे अमृत करून व्यवहार चालवीत होतो.
प्रबोधन चालू होताच त्यात मुमताज-होळकर प्रकरणावर कडव्या निर्णयाचे कडकडीत लेख येऊ लागले. चालू घडीच्या मिलर-होळकर- प्रणयाच्या यलुमाच्या थाबड्या डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या भटी वृत्तपत्रांनी आणि झब्बूंनी त्यावेळी होळकराच्या डोईमिशीचा केस न् केस उपटण्याचा देशद्रोही शिमगा चालविला होता. क्षात्रबच्चे मराठे पत्रकार व झब्बू खऱ्या ब्राह्मणालाही लाजवील असा निर्विकार महंतावस्थेत तो शिमगा पाहत स्वस्थ बसले होते. अशा चमत्कारिक प्रसंगी प्रबोधनने ह्या सर्व विरोधकांच्या सैन्यावर कदरबाज वारशास्त्राची बातेरी झाडून त्यांची भटी कावकाव बंद पाडली. अर्थात् त्यामुळे सारा पुणेरी शनीचा कंपू प्रबोधनावर आतल्या आत घुमसत होता. इतक्यात पुण्यास ब्राह्मणेतरी चळवळीने उग्र रूप धारण केले.
`देशाचे दुष्मन`मुळे जेधे जवळकरांवर शनीची संक्रात वळली. त्याला दुजोरा म्हणून भटांनी धनवडे प्रकरणाचा पराचा पारवा केला. जेथे जवळकरांनी टिळक-फुले-पुतळा प्रकरणाचे त्याला प्रत्युत्तर दिले. जेथे, जवळकरांदि मराठी अडाणी तोंडाने बेभान असले तरी लेखणीत कच्चे आहेत, वगैरे स्वयंमान्य गैरसमजुतीने शनिदेवांनी असा पक्का निर्णय ठरविला की, या साऱ्या ब्राह्मणेतरी तुफानाचे गुप्त सूत्रधार ठाकरेच होते, आणि हा सूत्रधार चांगला चेचून पुण्यातून कायमचा उखडल्याखेरीज, पुण्याचे पुण्यपावन शनिमाहातम्य यापुढे जगणेच शक्य नाही. हा निर्णय किती क्षुद्र मनाची अवलाद होता, हे चाणाक्ष वाचकांना सांगणे नकोच, पण त्या दिशेने मला खाड्यात घालण्यासाठी कित्येक कज्जेदलाल शनि माझ्या लेखावर आणि ग्रंथांवर रात्रंदिवस आपल्या अक्कला आपट आपट आपटीत होते. धमक्यांचा आणि फिरायला गेलो असता मारेकऱ्यांच्या गुप्त छाप्याचाही अनुभव घेतला. पण माझ्या काठीतल्या गुप्त तलवारीचे पाते बाहेर झळकताच `क्षात्रः क्षात्रर्भटोर्भट:` एवढ्यावरच मुकाबला मिटला.
धनवडे प्रकरणाच्या तिसऱ्या दिवशी व्हिजिट कार्ड छपाईच्या सबबीवर, हाताला बँडेज बांधलेले एक तरुण शनिदेव, गामा गुंगाच्या ऐटीने, थेट माझ्या माडीवर चढून आले. हेतू एवढाच की ठाकरे व्यक्ती किती लांबरुंद, जाडपातळ आहे, हे प्रत्यक्ष पाहून ठेवावे, मी त्यांना योग्य ती माहिती दिली, तेही चार शब्द गोड बोलले, आणि गेले. धनवडे प्रकरणनिषेधाच्या शिव्याजी (पुण्याच्या सदाशिव पेठेत भटांनी थापलेले शिवाजी मंदिर हे शिवाजी मंदिर नसून, त्याला शिव्याजी मंदिर म्हणणेच रास्त होईल. या कूसबंद भटी हल्ल्यात यच्चावत् ब्राह्मणेतरांच्या चळवळींना मनमुराद शिव्या देण्याचा क्रम गाजविला जात असतो. नाव शिवाजीचे आणि गाव भटजींचे असा शिव्याजी मंदिराचा सोवळा संप्रदाय पुण्यात सर्वश्रुतच आहे.) मंदिरातल्या सभेच्या दिवशी सायंकाळी तर प्रबोधन छापखान्याच्या पाटीचा शनिदेवांनी एवढा गौरव केला की, तेवढा राष्ट्रीय सभेच्या कोणत्याही अध्यक्षाच्या मिरवणुकीत झाला नसेल.
सभेकडे जाणाऱ्या प्रत्येक शनिटोळीतला प्रत्येक महात्मा प्रबोधन छापखान्याच्या पाटीकडे मुद्दाम वळून थांबथांबून बोटे दाखवीत होता व छत्र्या उडवीत होता. पण मी शनिग्रहाच्या मोटारीत बसलेला पॅसेंजर असल्यामुळे, मला ठार मारून साडेसातीचे नाटक कायमचे बंद पाडण्याइतका तो मूर्ख नव्हे, हे मात्र एकाही महामूर्खाच्या ध्यानात येई ना! मी मोटारीचे आचके दचके हवे तितके खाईन, पण मरणार कसा? मी मेलो, माझे चरित्र आटोपले की शनीही मेला, त्याचे माझे नाते गोते मेले. मग माझी साडेसाती तो दुसऱ्या कोणावर उगवून घेणार? गणिताचा ठोकताळा चुकवून हव्या त्यावर हवी तेव्हा शनि वक्रदृष्टी करू म्हणेल तर त्याच्या डोळ्याला विक्रमाच्या घाण्याच्या बैलाचा चष्मा लावायला कोणीही कमी करणार नाही!
पुणेरी शनिदेवांच्या सर्वच शनिलीला काही और! वाचकांना शितावरून भाताची पारख होईलच. मुद्रण प्रकाशनाच्या धंद्यावर सांपत्तिक दृष्ट्या मी थोड़ा सावरतो न सावरतो तोच टेम्पट्रेस पुस्तकाच्या खटल्याचा बॉम्ब फुटला आणि त्यात होते नव्हते त्याची वस्त्रगाळ चांदी आटली. शनिदेव संतुष्ट झाले! शापादपिशरादपिच ते! दोन्ही अस्त्रांचा मारा, इंद्रजितावर सुटलेल्या लक्ष्मण बाणाप्रमाणे कसा जोराने आपटला, हे जनार्दन जनतेला पुनरुच्चार करून सांगायला नकोच.
येनकेनप्रकारेण मला कोणत्या तरी खटल्यात अडकवून चेचण्याची कारवाई पुण्याच्या ठराविक कज्जेदलाल कंपूत मोठ्या आट्यारेट्याने चालल्याचे मला श्रुत होतेच. देशाचे दुष्मन खटल्यात माझ्या काही ग्रंथांचे पुरावे आरोपीतर्फे दाखल होत असता, `थांबा, थोडे थांबा. लवकरच हेही प्राणी बोर्डावर येणार आहेत` असा ध्वनि भर कोर्टात एका उच्चैः श्रव्याने काढल्याचे पुष्कळांनी ऐकून मला कळविले होते.
टेम्पट्रेस खटल्याच्या सबबीवर पांढऱ्याफेक नीतिमंतांच्या सोनेमोल मातीचे पिवळेधमक चलनी नाणे कायदेबाजीच्या टाकसाळीत घडत असतानाच, प्रबोधनाचे तरुण सहसंपादक बापूसाहेब चित्रे कल्याण मुक्कामी क्षयाला बळी पडले. बापूसाहेबांच्या मृत्यूने माझा उजवा हात लंजूर झाला आणि खटल्याने द्रव्यशोष करून डावा हात तोडला. खलास! पुन्हा मी हातपाय तुटून खास शनीच्या अड्डयात `चौरंगा` होऊन पडलो!
अशाही हीनावस्थेत प्रबोधन कचेरी आणि छापखाना पुढे पावणेदोन वर्षे हिमतीने चालविला; आणि याचे सर्व श्रेय माझे इमानी कामगार १) प्रभाकर चित्रे, २) मारुती हराळे ३) बापूराव वझे आणि ४) दिनकर सुरूडकर यांनाच आहे. त्यांच्या एकनिष्ठ प्रेमाचा आणि निश्चयी सेवेचा पाठिंबा नसता, तर १९२६-२७ सालात माझ्या हातून झालेली लोकसेवा झालीच नसती. लोकहितवादी साप्ताहिक म्हणजे ह्याच माझ्या कामगार बांधवांच्या प्रोत्साहनाचे गोड फळ होय. त्या १।।। वर्षात लक्ष्मी माझ्यावर इतकी रुष्ट झाली की `नच सुंदरी करू कोपा मजवरी धरि अनुकंपा` म्हणून मी तिची परोपरीने समजूत केली; पण व्यर्थ! केलेला प्रत्येक प्रयत्न सपशेल ठेचाळला. पुढे टाकलेले प्रत्येक पाऊल मागेच पडू लागले. व्यवहाराचा आव सांभाळण्यासाठी गृहलक्ष्मीनेही आपल्या सर्व मौल्यवान स्वोधनाचा स्वयंस्फूर्तीने होम करून, ती केवळ मंगळसूत्राची लंकेची पार्वती बनली. उपासमारीचेही काही प्रसंग अनुभवले, तथापि श्री हरीचे नाव घेऊन नेटाने कामभार रेटीत होतो.
इकडे, माझ्यावरील साडेसातीचे नाटक नटवायला निरनिराळ्या भूमिकांसाठी शनीने जी जी पात्रे निवडलेली होती, त्यांची अर्धवट राहिलेली कामे पुरी करून घेण्याचा शनीने संकल्प केला. तामलिंदा नगरीच्या वैश्याने चंद्रसेन राजाच्या दरबारात विक्रमाविरुद्ध चोरीची फिर्याद दाखल करण्यापूर्वी, विक्रमाला स्वतःच्या घरीच प्रथम चांगला कणक्या चोप दिला होता. सध्या हिंदुस्थानात चंद्रसेनाचे राज्य नसून इंग्रजसेनाचे राज्य असल्यामुळे, पाडळीच्या तामसनिंदा नगरीच्या वैश्याला माझ्यावर हा प्रयोग करताच येणे शक्य नव्हते. शिवाय, त्या वेळी खुद्द शनीचा सौदागरच आपल्या कडव्या कदरीचा चाबूक सरसावून, सात्त्विक संतापाने, माझ्या पाठीशी रात्रंदिवस उभा असल्यामुळे, तसल्या प्रयोगाचा नुसता वास येताच त्याने रक्ताचा सडा घातला असता. अर्थात् वैश्य भूमिकेची सांगता पार पाडण्यासाठी, संतोषाने घेणे नाकारून नसत्या देण्याच्या लिहून दिलेल्या `परमेश्वरी नोटी`वर फिर्याद करण्याची तेवढी पाडळीच्या वैश्याला प्रेरणा झाली. (पहा प्रबोधन, वर्ष ५ वे, अंक १० आणि लोकहितवादी, वर्ष १ ले, अंक ८) (वास्तविक असले क्षुद्र कृत्य आचरणारा हा मनुष्य नव्हे; आणि त्याला या व्यावहारिक चुकीचा तात्काळ पश्चात्तापही झाला. पण करतो काय बिचारा?
शनीच्या पकडीत सापडलेला तो गरीब नट. ठराविक नाट्यभूमिका यथातथ्य वठविणे त्याला भागच पडले. त्याचा तरी इलाज काय? चेतना झाली तसं नाचला व पुढेही नाचेल.) येथपासून शनीने लोकव्यवहाराचे क्षेत्र सोडून कायदेबाजीच्या कोर्ट क्षेत्रात तांडवनृत्य आरंभले. प्रबोधन कार्यासाठी ज्यांनी ज्यांनी लहान मोठ्या रकमा कर्जाऊ दिल्या होत्या, त्या सर्वांची माणसकीची काळिजे शनीने खच्ची करून, त्या ठिकाणी कज्जेदलालाची काळिजे उलटी टांगली. भराभर फिर्यादी आणि समन्सांचा माझ्यावर वर्षाव होऊ लागला. सगळ्याच घेणेदारांनी एकदम गिला केला तर मोठमोठ्या बँकांचे चुटकीसरसे दिवाळ्याचे टिंपाड वाजते; मग माझ्यासारख्या व्यक्तीच्या कारभाराची गोष्ट कशाला? कोर्टातली न्यायपद्धती काय विचारावी? आले हरभऱ्याचे पोते, घाल भट्टीत, फोड फुटाणे.
हा वऱ्हाडी हरभरा, हा घाटी हरभरा, हा कोकणी हरभरा, ह्याची थोडीच चौकशी होते? आली फिर्याद दे डिक्री. पण डिकऱ्या म्हणजे प्रतिवादाच्या खिशात दमड्यांची निपज करणाऱ्या जंत्र्या नव्हेत, ह्याची दखल वादी किंवा न्यायाधीश यांना मुळीच नसते. सर्वच परिस्थिती उलटीपालटी झाली आहे. नाण्याच्या टंचाईमुळे सरकारच्या बजेटचाही बजबजाट पागडीपालटीचा होत चालला आहे. दुष्काळ रोगराईच्या जोडीनेच बेरोजगारीचा फास लोकांच्या गळ्याला तट्ट लागल्यामुळे, आज त्यांच्या हालांचे वर्णनही करवत नाही. पांढरपेशा वर्ग भिकाऱ्याहूनही भिकारी बनला आहे. हायकोर्टातल्या नादारीचे लिष्ट मारुतीच्या शेपटाप्रमाणे दररोज भरंसाट वाढत आहे. व्यापारी लोकांच्याही खिशाना भोके पडून त्यांच्या तिजोऱ्या रिकाम्या पडत चालल्या आहेत. मोठमोठ्या बँकांचे दरवाजे खडाखड बंद होत आहेत. जमाना उलटा झाल्यामुळे जबान बिघडली आहे. माणसांना माणसे खाऊ लागण्याचा काळ दत्त म्हणून उभा आहे. तरीसुद्धा कायदेबाज फिर्यादी, कज्जेदलाल वकील आणि कोर्टातली न्यायाधीश अजून रामकाळच्या सुवर्णयुगाच्या स्वप्नात दंग दिसतात, हा ब्रिटीश राज्यपद्धतीचा इतिहास लिहिताना काळी शाईसुद्धा लज्जेने पांढरीफिकट पडते!
शनीचा अखेरचा तडाखा काय?
साक्षात् मानवी शनीने माझ्यावर फेकलेल्या कायदेबाजीच्या अस्त्रांना तोड द्यायला ७ नोव्हेंबर १९२७ रोजी पुण्याच्या घरातून मुंबईस येण्यासाठी पाऊल बाहेर टाकले. हे पाऊल कायमच्या उच्चाटनाचे आहे, माझा छापखाना व प्रबोधन कचेरी पुनरपि त्याच ठिकाणी असलेली पाहण्याचे मला लाभणार नाही आणि नेहमी प्रमाणे टांग्याभोवती जमलेल्या कामगारांचा मुजरा हा शेवटचा निदान पुण्यातला तरी अखेरचाच मुजरा असेल, अशी मला किंवा कोणालाही कल्पना आली नाही. पण शनि काय करणार नाही? सांगायला अगर लिहायला लागणाऱ्या वेळेच्या शतांशात या पुढील घडलेले चमत्कारिक प्रकार इतक्या कल्पनातीत घटनेने घडले की त्याचा यथातथ्य परिचय करून देण्याच्या कामी माझी बुद्धीच पांगळी पडते, मग लेखणी लंगडी का न पडावी?
कादंबरीकाराच्या आणि कवीच्या कल्पनेलाही चकविणारे रूपाचे आणि वेदनांचे चित्र रेखाटण्याच्या कामी मी, सरधोपट निबंधकार, माझा कमकुवतपणा बिनशर्त कबूल करतो. ग्रहदशेने असो वा व्यावहारिक अडचणीने असो, पण परिस्थिती एकदा बिथरली की तिच्या शतमुखी तोंडात लगाम चढविताना मोठमोठ्या विक्रमी पुरुषांची मति आणि कृती कशी कुंठित होते, त्यांची धोरणे त्यांना कशी नडतात आणि मित्रसुद्धा शत्रू होऊन त्याच्या होळीने आली दिवाळी कशी साजरी करू पाहतात, याचा इतिहास मी पुष्कळ वाचलेला आहे, प्रत्यक्ष पाहिलेला आहे, आणि आता तर डोळे उघडे ठेवून जिवंतपणी अनुभवला आहे. श्रीहरी! तुझी माझ्यावर अशीच कृपादृष्टी असू दे. संकटांच्या भट्टीत माझ्या आचारविचार उच्चाराला चांगले खरपूस भाजून, त्यांच्याद्वारे जनता-जनादर्नाची माझ्याकडून अखंड सेवा घडावी.
१९२७च्या नोव्हेंबर पासून परिस्थितीच्या पालटाचे फेरे इतक्या आश्चर्यचकित वेगाने फिरू लागले की अवघ्या दीड महिन्यात होत्याचे नव्हते झाले. १० डिसेंबरला लोकहितवादीचा १३वा अंक निघेपर्यंत जो मी महाराष्ट्राच्या विचारक्षेत्रात क्रांतीचा धुमाकूळ घालीत होतो, तो मी अवचित निष्क्रीय बनलो. प्रकृती अनपेक्षित बिघडली, म्हणून घरची मंडळी पुण्याहून दादरला धावून आली. घरात पाऊल ठेवतात तोच एकुलते एक चिरंजिवास ब्रांको न्युमोनिया! एका मुलीस डांग्या खोकला. दुसरीला मलेरिया. कुटुंबाला डिसपेपसिया. तिकडे पुण्यास छापखाना हातचा गेला. प्रबोधन कचेरीचे दरवाजे लागले. इमानी कामगार घरी बसले. बोलबोलता पुण्यातले अस्तित्व धुक्याप्रमाणे नाहीसे झाले. मी तर दादरला बिछान्यात!
रात्रंदिवस चिंतेने आणि खेदाने मस्तक पोखरले. त्यात सावकारांचे तगादे आणि समन्सांच्या बजावण्या (जप्त्या आणि पकडवॉरंटाचे विधीच काय ते व्हायचे राहिले आहेत. संस्कारच ते! ते नाहीत झाले तर मी संस्कृत होणार कसा?) आजारी अवस्थेत सुद्धा पैशाची जमवाजमव करून घसरत्या परिस्थितीला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण दोन तीन अपवाद खेरीज करून, बाकीच्या सर्व धनिक मित्रांनी `आज या उद्या या` आशीर्वादाने माझी हेटाळणी मात्र केली. निसरडेच ते! त्यावर मी कितीसा कसरत करणार? अखेर पडलोच खाली जमीनदोस्त विचारयंत्र बंद, लेखणी सांदीला सभोवार अंधार! चावट बंधूने आणि मेहुण्याने मला सहकुटुंब सहपरिवार पोसून शक्य तो योगक्षेम चालवावा आणि मी आकाशाकडे पाहत स्वस्थ बसावे. वाचकांनी या भयंकर स्थित्यंतराची करवेल ती कल्पना करावी.
झाले पस्तुत प्रकरणाच्या घटकेपर्यंतची माझी कर्मकथा येथे पुरी झाली. यापुढे तिचा उत्तरार्ध कसा रंगणार हे श्रीहरीला ठावे! मी काय सांगणार? प्रस्तुत कथेच्या कथनाने मी माझ्या योग्यतेला विक्रमाच्या श्रेष्ठतेच्या उंचीवर नेऊन ठेवीत आहेत. असा निष्कारण गैरसमज वाचकांनी करून घेऊ नये. घडल्या गोष्टी सत्य सत्य सांगितल्या आहे. त्या प्रत्यक्ष घडताना मात्र शनिमाहात्म्याच्या तपशिलाबरहुकूम घडत आहेत, याचीही मला काही कल्पना नव्हती आणि हे असे कसे बिनचूक घडले, याचे वाचकांप्रमाणेच मलाही आश्चर्य वाटत आहे. विक्रमाच्या कहाणीत १) शनि सौदागराच्या वेशाने आला, २) भिंतीचा निर्जीव हंस, ३) विक्रमाचे हातपाय तोडले जाणे, वगैरे गोष्टी, महिपतीकृत शनिमाहात्म्याच्या लक्षावधी वाचकांना, अघटित चमत्कार, देवीची करणी किंवा कल्पित कादंबरी अशाच वाटत असतात. परंतु माझ्या अनुभवाच्या उपरोक्त कथनावरून सर्वांना स्पष्ट समजून येईल की असल्या गोष्टी अगदी शक्य आहेत; फक्त कवीच्या वर्णनातील गूढार्थ मात्र नीट लक्षात घेतला म्हणजे झाले.
`भिंतीचे निर्जीव हंस` तर प्रत्येक मनुष्याला व्यवहारात पदोपदी भेटतात. आत्मनिरीक्षणाच्या शोधन प्रकाशाने त्यांन कोणी स्मरणशक्तीकडून गिरफदार करवीत नाही, इतकेच. शनिमाहात्म्यातील विक्रमाचे हात पाय एकदाच शेकडो वेळा तुटक आहेत. माझीच कर्मकहानी पहा. सात आठ कामगारांच्या संसाराची जबाबदारी सतत चार वर्षे पार पाडणारा मी अखेर सहकुटुंब सहपरिवार धाकट्या भावा, मेहुण्याच्या कृपाछत्राखाली येऊन पडलो. त्यांनी कर्ज करावे आणि आमचा योगक्षेम चालवावा. काल प्रबोधन आणि लोकहितवादी या घोडी रथात आरूढ होऊन, कलम- समशेरीच्या तडाक्याने मोठमोठ्या झब्बूंची रग जिरविणारा, भिक्षुकशाहीला दे माय धरणी ठाय करणारा, आणि विचारक्रांतीच्या प्रचलित तुफानी वावटळात हजारो वाचकांना निश्चित विचारांची दिशा दाखवून त्यांच्या बिलाचे रोखठोक प्रबोधन करणारा प्रबोधनकार आज कसे करू काय करूयात पायाळ होऊन पडावा काय?
काल घोड्यावर, आज खंदकाच्या धुळीत. काल चांगला सशक्त, आज सर्वस्वी अशक्त, काल चेक खरडीत होतो, आज कोणालाही कार्ड खरडीन तर तर दोन पैशांसाठी बत्तीस दातांची विचकणी. विनंतीचा एक शब्द ऐकताच जो मी माझ्या गरजू मित्रांना ५ ते २०० रुपयांच्या रकमा झटकन् उसनवार देणारा, त्या मला आज माझ्या खाजगी आणि सार्वजनिक जीवनकार्यासाठी मुर्दाड धनिकांच्या दाढीचे केस मोजण्याचा प्रसंग यावा काय? असे किती आणखी प्रसंग सांगावे! विक्रमाचे हातपाय तुटतात, ते असेच नव्हे तर काय?
या आपत्ती टाळता आल्या नसत्या काय?
सगळ्याच नाही, तरी बऱ्याच खास टाळता आल्या असत्या. मी ज्या आपत्तीच्या चरकात पिळून निघालो, त्याला ग्रहदशा जरी कारण असली, तरी मी त्याचा सर्व दोष माझ्या स्वतःच्या अज्ञानाला देतो. माझे अज्ञानच माझ्या आपत्तींना कारण. ग्रह, ग्रहदशा आ ित्यांचे फेरे या चिजा काय आहेत, या बाबतीत माझी `सबझूट` वृत्ती आणि तद्विषयक चिकित्सापूर्वक विचार किंवा अभ्यास करण्याची निवृत्ती, हीच मला विशेष भोवली. आज या ग्रंथात ग्रहदशेच्या फेऱ्याचा उलगडा करताना मी ज्या निरनिराळ्या दृष्टीकोनानी माझ्या स्वतःच्याच चरित्राचे आत्मनिरीक्षण केले, त्या दृष्टीकोनांचा ज्योतिषी लोकांच्या अकलेत पुरा खडखडाट. ज्योतिषविषयक मराठी व देशी ग्रंथ पाहिले, तो त्यात सारा पारिभाषिक शब्दांच्या काथ्याकुट्याचा खरकटवाडा! असे का होते? का व्हावे? होत असेल तर कसे टाळावे? असल्या चिकित्सेचा त्यात भरपूर अभाव.
कूपीं की जलधींत कुंभ भरतां घे मापिले तत्त्वता
या पलीकडे सिद्धांत नाही. उन्हाळा कडाडला असता, बाहेर पडणाऱ्याचे पापड भाजतीलच भाजतील, हे मुलांना सुद्धा समजते. अशा वेळी छत्री जोड्याची शिफारस करणाऱ्या शास्त्राची आणि मित्राचीच वास्तविक खरी किंमत.. शनीच्या साडेसातीविषयी अगर एकंदर ग्रहदशेच्या गुणधर्माविषयी मला स्वतःला काही निश्चित ज्ञान असते, एखाद्या ज्योतिषी मित्राने मला ते करून दिले असते, अगर त्याच्या चर्चेचा एखादा सुबोध ग्रंथ माझ्या हातात ठेवला असता, तर साडेसातीच्या काळात विशेष खबरदारीने आणि धोरणाने वागलो असतो; आणि ग्रहदशाप्राप्त आपत्तीचे आघात त्यावेळी जरी मला टाळता आले नसते, तरी त्यांची नांगी मला खात्रीने बरीच बोथट करता आली असती. अकल्पित आघातांचा अचानक मारा.
आगामी जाणिवेच्या ढालीवर खबरदारीने खास झेलता आला असता. कड्यावरून मी कोसळलो असतो, पण एखाद्या कपारीला घट्ट पकडून सावरलो असतो; अचेतन दगडधोंड्यासारखा थेट पायथ्याशी येऊन पडलो नसतो. अपायाला उपाय हा असलाच पाहिजे. साप कितीही विषारी असला, तरी त्याची सुद्धा गठडी वळवायला मुंगूस असतोच. काट्याने काटा निघतो आणि विषानेही विष उतरते. पण रोगाचे ज्ञान नाही, त्याचे कारण समजत नाही आणि उपायही उमजत नाही, अशा स्थितीत माणसासारख्या माणसाने प्रवाहपतित ओंडक्याप्रमाणे परिस्थिती नेईल तिकडे बिनतक्रार वाहत जाणे, ही खरोखरच शोचनीय स्थिती होय.
आपत्ती दोन प्रकारच्या असतात. नैसर्गिक आपत्ती आणि मानवकृत आपत्ती. तुफाने, वावटळी, धरणीकंप, ज्वालामुखींचे स्फोट, वीज पडणे, पावसाचे अवर्षण इत्यादी प्रकार नैसर्गिक आपत्तीचे होत. यांना `अस्मानी सुलतानी` असे नाव आहे. या आपत्ती टाळण्याचे पुष्कळ प्रतिबंधक उपाय माणसांनी शोधिले आहेत, तरीही त्यांना कायमचा प्रतिकार करण्याच्या कामी मनुष्य अजून पंगूच ठरलेला आहे. धरणीकंप धडाडू लागला किंवा तुफानात घरेदारे कोसळू लागली की मनुष्याच्या हात देवाच्या प्रार्थनेपलीकडे काहीच साधन उरत नाही. परंतु मानवकृत आपत्तीचा प्रश्न असा नव्हे. मंगळ मातला आणि शनि खवळला, तरी ते दगडमातीचे अंतराळातले गोळे माणसे होऊन आमच्या बोकांडी बसायला येत नाहीत. अर्थात ग्रहदशेच्या आपत्त्या माणसांना माणसांच्याच हातून भोगाव्या लागतात, हे आपण ५, ६ आणि चालू ७व्या प्रकरणी पाहिलेच.
काही कल्पनातीत घटनेचे चमत्कार आणि अपघात वगळले, तर ग्रहदशेच्या बहुतेक आपत्त्या मनुष्यकृत असतात. आणि त्या तशा असल्यामुळे शेराला सव्वाशेर या नात्याने, किंवा परस्पर पावणेतेरा धोरणाने, मनुष्याला त्याच्याशी झुंज घेता येणे शक्य आहे. प्रतिकाराचा मारलेला फटका किंवा प्रयत्नांची हाणलेली डुक्करमुसंडी प्रतिकूल ग्रहदशेमुळे यशस्वी झाली नाही, तर ‘मी प्रतिकाराची आणि प्रयत्नांची शिक्त केली` एवढे समाधानसुद्धा कमी महत्त्वाचे नव्हे. परंतु व्यावहारिक विरोधांची जाणीव ठेवतानाच, विश्वातल्या इतर गूढ शक्तींच्या विरोधांची कसलीच जाणीव आपण ठेविली नाही, अगर त्यांच्या परस्पर संबंधांना सबझूट मानले, तर त्या अज्ञानापासून होणाऱ्या आघातांना पायबंद कोणी आणि कसा लावावा? विरोधाची कल्पना झाली तरच त्याच्या प्रतिकाराची खबरदारी मनुष्य ठेवील, मग ते प्रतिकाराचे उपाय मवाळ असोत वा जहाल असोत, धार्मिक असोत वा कार्मिक असोत, शारीरिक असोत वा मानसिक असोत.
ज्योतिषांचे ज्योतिष म्हणजे भूताचे भविष्य
आकाशस्थ ग्रहांचे दशेचे ऊर्फ गुणधर्माचे परिणाम प्राणिमात्रावर त्याच्या जन्मजात प्रकृतीप्रमाणे होतात किंवा नाहीत, ह्याविषयी मी पूर्वी कधी काही विचारच केला नव्हता. बरे, ज्या ज्या ज्योतिर्विदांशी भाषण-प्रसंग घडले, त्यांना ह्याविषयी माझी मुळीच खात्री पटविता आली नाही. त्यांना माझ्या नेहमीच्या `का?`चे समाधान करता आले नाही. केवळ बाबावाक्यं प्रमाणम् मानणारा मी नव्हे. विवेकाला पटल्याशिवाय मी कशावरही आंधळा विश्वास ठेवीत नाही. बहुतेक सारे ज्योतिषी गोष्ट घडल्यावर तिचे भविष्य वर्तविणारे भविष्य पुराणकार असतात. १९२३ ते १९२७ अखेरपर्यंत माझे बॉम्बस्फोटी जीवन अभ्यासून, `तुमची सध्या साडेसाती चालू आहे` असा अनेक ज्योतिषांनी एकच गिला चालविला. पण त्यावर उपाय काय? तर उपाय काहीच नाही. `स्वस्थ बसावे! हरी ठेविल तैसे राहावे!` फार छान उपाय! पडतील ते आघात आणि घडतील ते संस्कार सोशीत घोड्याप्रमाणे अचेतन पडून राहावे अं?
साडेसाती सुरू होऊन तिचे उपरोक्त बॉम्ब माझ्यावर कडाकड फुटेपर्यंत मात्र हे सगळे आकाशस्थ ग्रहशनि तोंडाला कुलूप लावून स्वस्थ मजा पाहत होते. परिणाम घडल्यावर त्याची कारणमीमांसा थेट शनि, राहू, केतूच्या माजघराशी नेऊन भिडवणारे कुंडलीबहाद्दर पुष्कळ असतात. तेवढ्यासाठी ज्योतिषशास्त्र - प्राविण्याची फुशारकी कशाला? दिवा भडकून घर पेटून जमीनदोस्त झाल्यावर, राहूच्या महादशेची सबब ज्योतिष्याच्या दूरदृष्टीचे मुळीच समर्थन करू शकणार नाही. घडल्या गोष्टी सांगण्यासाठी ज्योतिषशास्त्रच कशाला? आमचे घर का पेटले? तर दिवा भडकला म्हणून. दिवा का भडकला? आमचा गाढवपणा म्हणून. आकाशस्थ राहू, शनि रॉकेलचा काकडा घेऊन थोडाच आमचे घरी येत असतो? कर्माचे कारण व्यवहारशास्त्रसुद्धा बिनचूक सांगते. त्यासाठी निराळ्या ज्योतिषशास्त्राची जरूर कशाला? Forewarned is forearmed (आगाऊ एखाद्या घटनेची स्पष्ट सूचना असली, तर मनुष्य तितकाच सावधगिरीने वागतो.)
येत्या आठवड्यात तुमच्यावर मारेकऱ्याचा हल्ला होण्याचा संभव आहे, असा इशारा मिळाल्यावर कोणीही आत्मसंरक्षणाच्या साधनांशिवाय बाहेर पडणार नाही. अचानक रीतीने होणारा मारेकऱ्यांचा हल्ला, मनुष्य सावध असता होणाऱ्या हल्यापेक्षा, पुष्कळच कमी आघाताचा होईल! बाहेर कडक उन्हाळ्याचे फुटाणे स्पष्ट दिसत आहेत. अशा वेळी `जोडा-छत्री घेऊन बाहेर पडा` असा निःसंदिग्ध इशारा न देता, एखादा माणूस पाय पोळून सनस्ट्रोकने मेल्यावर, `हा साडेसातीचा परिणाम` म्हणून विद्वत्ता पाघळणाऱ्या ज्योतिष्याची त्याच उन्हात खांबाला उघडाबोडका बांधून कोणी संभावना केली, तर त्यात काही चूक होणार नाही, असे मला वाटते. आकाशस्थ ग्रहदशेचे बरे वाईट परिणाम मनुष्यमात्रावर होतात हे जर सिद्ध सत्य आहे, तर त्याविषयी आगामी सूचना देणे, इतकेच नव्हे तर उपाय सुचविणे, हेच वास्तविक ज्योतिष्यांचे कर्तव्य. पण बहुतेक सारे ज्योतिषी नुसते गणित्ये ठोकळे असतात.
त्यांचे उपाय म्हणजे मारुतीच्या मूर्तीवर शेंदूरतेल थापा आणि हातपाय जोडून स्वस्थ बसा, असे ठराविक मासल्याचे असतात. अमूक ग्रह क्या गृहात आला की त्याचे फळ अमूक. असल्या पाचसहाशे वर्षापूर्वी ठरलेल्या ठोकताळ्यापलीकडे त्यांची अक्कल जात नाही. मग मनुष्याच्या स्वभावप्रवृत्तीचा, त्याच्या अंतस्थ संस्कृतीचा, त्याच्या चारित्र्याचा, कशाचाही विचार करीत नाहीत, तीनात चार मिळाले की बेरीज सात, एवढेच भांडवल. त्या पेक्षा अधिक विचार नाही, शोधन नाही, स्वाध्याय नाही, विश्वात आणि व्यवहारात नित्य होणाऱ्या बदलांची जाणीव नाही. असल्या पोटार्थी प्राण्यांच्या कक्षेत येणारी प्रत्येक दैववादी हटकून मर्दाचा नामर्द आणि अर्जुनाचा हिजडा बनत असतो. दैवाच्या रेषा समजून घेण्यासाठी येणारा माणसाला आत्मनिरीक्षणाचा कानमंत्र देणारा एकही ज्योतिषी माझ्या आढळात किंवा ऐकिवात नाही. आत्मनिरीक्षणालाच जे स्वतः पारखे, त्यांनी इतरांच्या दैवाची गणिते सोडविण्याची घमंड मारणे, हे हिंदू पोटार्थी ज्योतिष फार भयंकर आहे.
अखेर संक्रांतीला विचारक्रांती झाली
सर्व सणात मला संक्रांतीचा सण फार आवडतो. त्याच्या नावात क्रांती तर आहेच आहे, पण या दिवसापासून साऱ्या विश्वाच्या चक्रगतीतही क्रांतीच होत जाते. अशा या क्रांतिकारक दिवशी प्रत्येक विचारवंताने आपल्या चरित्राचे सिंहावलोकन करावे, गुण दोषांची छाननी करावी, कर्म अकर्मचा आढावा काढावा, कर्तव्याचा नकाशा नीट अभ्यासावा, यशापयशाची मुद्देसूद चिकित्सा करावी आणि तीळ व गूळ या स्नेहाळ व रसाळ प्रसादाची देवघेव करून, माणुसकीच्या उच्च मानवधर्माची आपली ईश्वरदत्त दीक्षा विशेष उज्ज्वल करावी. दरसाल या दिवशी मी आत्मनिरीक्षणात मग्न असतो. Man know thyself (मानवप्राण्या स्वतःला ओळख) हाच संक्रांतीचा खरा संदेश आहे. `आपण आपणाशी ओळखावे । या नाव ज्ञान` असा समर्थांचाही इशारा आहे. ह्या दिवशी मी जे चिंतन मनन केले, त्याचा परिणाम मी प्रस्तुत ग्रंथाच्या रूपाने जनता जनार्दनाच्या सेवेला सादर रुजू करीत आहे. हातपाय तुटून आपत्तींच्या मुरोळ्यात लोळत लोळताही `शनिमाहात्म्य` लिहून मला माझ्या देवाची जनता जनार्दनाची सेवा करता आली, हे काय लहानसहान समाधान?
****
प्रकरण ८ वे
विक्रमाच्या साडेसातीची कहाणी (उत्तरार्ध)
विक्रमराजाचे हातपाय तोडून त्याला गावाबाहेर फेकून दिले, त्याला कोणी अत्रपाणी देऊ नये अशी सक्त ताकीद जाहीर झाली, येथपर्यंतच्या कहाणीचा परामर्श तिसन्या प्रकरणात घेतला, येथून साडेसातीचा उत्तरार्ध चर्चेला येऊ.
एका महिनाभर विक्रमाला अत्रपाणी मिळाले नाही. कारण राजाज्ञाय तशी कडक होती. पुढे राजालाच दया आली आणि अत्रपाणी देण्याची त्याने मोकळीक दिली अशा अवस्थेत दोन वर्षे गेली. शनिग्रहाच्या कदरीला उतरती कळा येऊ लागली. त्याचा जहाल गुणधर्म मवाळ पडू लागला. तेव्हा संकटसमाप्तीचे एकेक योग, पूर्वीच्या संकटप्राप्तीप्रमाणेच, आपोआप येऊ लागले. एके दिवशी उज्जनीची एक तरुण तेलीण पालखीत बसून तामलिंदा नगरीला आपल्या सासरी चालली होती. तिने उकीरडयावर हा कोण प्राणी पडला आहे, म्हणून सहजगत्या न्याहाळून पाहिले, तो हा आपला विक्रम राजा लगेच ती पालखीतून उतरली व राजाला प्रणिपात करून त्याच्या आपत्तीची कळकळीने विचारपूस करू लागली. सर्व क्षेमवृत्तांत परस्पर श्रुत झाल्यावर, त्या राजनिष्ठ तेलिणीने विक्रमाला पालखीत बसवून सासुरवाडीस आणले. चोरीच्या आरोपावरून शिक्षा झालेला हा दुर्देवी प्राणी आपल्या सुनेने घरी आणलेला पाहताच तेलीबोवा घावरून गेले.
तंव तो तेली कांपे थरथरा । म्हणे नसते विघ्न आणिले घरा ।
जरी श्रुत होईल राजेश्वरी । मग कैसे करावे आपण ।।
तेलीच तो! पाण्यापुरतीच त्याची अक्कल, पण ती तेलीण आणि डोक्याची. बोलून चालून ती उज्जनीची! ती आपल्या भेदरट सासऱ्याला सून मोठी धीराची म्हणाली, "अहो मामंजी, असे घाबरता कशाला? हा कोणी आडुमाडू नव्हे."
हा माळवा देशीचा धनी । उकीरड्यात पडला चिंतामणी ।
दैवे लाबला आपणालागोनी । म्हणोनी आला गृहाते ।।
तेली बोवाला धीर आला. त्याने जाऊन राजाला विनंती केली की, “महाराज, आपण हातपाय तोडून नगराबाहेर टाकलेल्या इसमाला, सरकारची परवानगी मिळेल तर मी घरी बाळगायला तयार आहे. त्या दीन अनावावर आता दया करावी."
मग राव म्हणे भलारे भला । आणावे तथा तस्कराला ।
प्रतिपाळ करी वाहिला । अन्नवस्त्र देखोनी ।।
ग्रहदशेची कमान एकदा उतरू लागली की चढत्या कमानीच्या काळातले सगळे हंबीरराव गंभीरराव हिंदु हाटेलातल्या आईसक्रीमप्रमाणे पाण्यापेक्षा पातळू लागतात. मग त्या वेळी तेलीणच काय, महारीण मांगीणसुद्धा मातेच्या ममतेने त्या दुर्दैवी माणसाचा कैवार घेते, राजाची संमती घेऊन तेली घरी येताच,
मग राव म्हणे मेहतरासी । तुम्ही श्रुत न करावे कोणासी ।
विक्रम आहे मम गृहासी । ऐसे कोठे न वदावे ।।
बरोबरच आहे.
विक्रमी पुरुषाचे अध: पतन होताच त्याला त्या पतनावस्थेत जगाला तोंड दाखविणे मरणप्राय वाटते. लाखो रुपयांचे दिवाळे काढून पुन्हा खादीच्या पांढयाफेक आवरणाखाली नाक वर करून चालण्याची गुर्जर देशीय सफाई लोकमान्य असली, तरी खऱ्या खानदानीचा खंबीर वीर आपल्या आपत्काळी अज्ञातवासय पत्करतो. त्या दयाळू तेल्याने
घाणा हाकावा माझिया घरा । देइन मी अन्न आणि वस्त्र ।
या अटीवर विक्रमाची नेमणूक केली आणि माळव्याचा चक्रवर्ती राणा एका यः कचित तेल्याचा घाणा हाकून जगू लागला. परिस्थितीच्या प्रतिकूळ लाटा कोणाला कोठे कशा नेऊन टाकतील, याचा काही नेम नाही!
तात्याजी महिपतीने ही तेल्याच्या घाण्याची कल्पना अतिशय रम्य आणि समर्पक योजिली आहे. किंबहुना, त्याने रचिलेल्या विक्रम काव्यातल्या तेल्याचा घाणा म्हणजे त्याच्या योजना- कुशलतेचा `मास्टर स्ट्रोक`च म्हटला तरी चालेल. आपत्काळाची कमाल झाली म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या मस्तकांत तेल्याचा घाणाच चालू होतो. सारा दिवस रात्र गरगर फिरतो, तरी प्राणी अखेर आपल्या जागेवरच. विचारांवर विचार आणि बेतांवर बेत हजारो लढवा, अखेर बेरीज पूज्यच. जेवढी धडपड करावी तेवढी जागच्या जागी चिरडून तिचे तेल व्हायचे.
आजूबाजूला सोबती कोण? तर बैलोबा, आणि त्यांचेही डोळे घट्ट बांधलेले. जरा इकडे तिकडे हालचाल करावी तो हात नाहीतर पायच घाण्यात पिळून निघायचा. तीच तेलकट खोली, तोच घाणा, तेच आसन, तोच बैल, तीच प्रदक्षिणा, चालली आहे गिरकी रोजच्या रोज! ना गतीत बदल, ना स्थिती बदल! डोके आपटा नाहीत प्राण द्या, या क्रमात बिलकूल फरक पडायचा नाही. विचार कर करून डोके फुटले तरी घाणा मात्र कायमच्या कायम! पुष्कळ वाचकांना आपल्या संसारक्रमात हा अनुभव आलेला असेल. त्यांना महिपतीच्या या घाण्याचे चित्र कुतूहलोत्पादक खास वाटेल. मनुष्याची परिस्थिती एकदा ढासळली की ती सावरण्यासाठी त्याच्या आचारविचारांच्या धडपडी कशा चालतात, त्याचे चित्र ह्या तेल्याच्या घाण्यात यथातथ्य पहावयाला मिळते. पुढे, तीच परिस्थिती निवळू लागली, ग्रहदशेचे मान अस्ताकडे कलंडू लागले की क्षुल्लक कारणानेसुद्धा त्याच्या क्षुद्र उच्चाराला किंवा आचाराला किती विलक्षण महत्त्व येते, हे आता पहा.
विक्रमाच्या साडेसातीपैकी ७ वर्ष पूर्ण झाली. घाणा हाकण्याचे काम करीत असता, एक दिवस संध्याकाळी दीपरागाचे सूर काढून गाण्याची विक्रमाला सहज बुद्धी झाली. यापूर्वी सुद्धा त्या बिचाऱ्याने अनेक वेळा आपला कंठ मोकळा केला असेल, जात्यावर किंवा घाण्यावर माणूस बसला की तो सहसा तोंड मिटून बसणार नाही. काहीतरी आं आं उं ऊं करणारच, पण आज त्याच्या आंआंउंउंला महत्त्व यायचे होते. विक्रमाने दीप रागाचे सूर आळवून
रागउद्धार करितां प्रत्यक्ष । दीप लागले लक्षानुलक्ष ।
जैसी दिपवाळीच देख । प्रकाशमान नगरात ।।
त्या नगरात कितीक तरी रहिमतखां तानसेनखां असतील. गाड्यावरी गंधर्व पडले असतील. त्यांचे तबले, तंबोरे सकाळ संध्याकाळ सुरू असतील. पण त्यापैकी एकाच्याही भाग्यात दीपराग आळवून साऱ्या नगरात `इलायट्रीची दिवाळी` निर्माण करण्याचे सामर्थ्य नव्हते. ते फक्त विक्रम राजालाच लाभले. बरे, हा विक्रम तरी कोणी धंदेबाज गवय्या होता, असेही नाही. पण एकदा का भाग्योत्कर्षाची लाट येऊ लागली की, क्षुद्र गोष्टीसुद्धा भलत्याच महत्त्वाची किंमत हबकून बसतात. हातात माती धरली तर त्याचे सोने होते म्हणतात, ते हे असे.
विक्रमाच्या दीपरागाने साऱ्या नगरात भलत्याच हंगामात दिवाळी केल्यामुळे एकखांबी माडीवर राहणाऱ्या पद्मसेना राजकन्येचे तिकडे विशेष लक्ष गेले, तिने ताबडतोब आपल्या दासींना
दीपावली तो आज नाही । आणि लग्नही नसे कोठेहि ।
तरी हे आश्चर्य दिसते काही । पाहून यावें सत्वर ।।
अशी आशा केली, त्या साळकाया माळकाया पदर सावरून बाहेर पडणार तो.
इकडे दीपराग झाला संपूर्ण । तेव्हा दीप मावळले मुळीहून ।
दुसरा श्रीराग नामेंकरून। तेथे राग आळवितसे ।।
तेव्हा पद्मसेना म्हणाली की, `हा पुरुष विशेष रागज्ञानी दिसतो. सारे नगर धुंडाळा आणि जिथे तो असेल तेथून येथे लवकर घेऊन या.` तात्काळ चार दासी नगरात शोध करायला निघाल्या.
दीपराग आणि श्रीराग या तात्याजी महिपतीच्या कल्पना फार गोड आणि समर्पक आहेत. साडेसातीच्या काळ्याकुट्ट ढगांनी हृदयाकाश एकदा का गर्द कोंदाटले, म्हणजे मनुष्य अंतर्बाह्य अंधारात गुरफटून बुळाबावळा बनतो. अशा वेळी त्याला आपली अंतस्थ ज्ञानज्योतच पाजळून, आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण करावे लागते. दिवा लावल्याशिवाय अंधार जाणार कसा आणि दिसणार काय? हेच `अंतरीच्या ज्ञान-दिव्या`चे तत्त्व महिपतीने दीपरागाच्या उपमेने व्यक्त केले आहे. एकदा दीपराग चांगला आळवला गेला, अंतरीचा ज्ञान-दिवा प्रज्वलित होऊन आजूबाजूवर प्रकाश पडला, की त्याच्या पाठोपाठ `श्री` राग ठेवलेलाच. दीप लावल्याशिवाय श्रीची प्राप्ती होणार कशी?
पद्मसेनेचा एकखांबी महाल तेलीआळीत तेल्याच्या घरानजीक खात्रीने नसला पाहिजे, तो कोठेतरी दूर गावाबाहेर मोकळ्या हवेतच असणार. कोणीही मोठा तानसेन असला तरी त्याची तनादानी आणि रागदारी फार फार तर त्या आळीतल्या लोकांना थोडी ऐकू जाईल. पण साऱ्या नगरात आणि नगराबाहेर राजकन्येच्या एकखांबी महालात कशी ऐकू जाणार? (रेडिओची सिद्धी २०व्या शतकातली आहे. ती विक्रमाच्या वेळी खास नव्हती.) तथापि, जेथे सहज रागोद्धाराने साऱ्या नगरात दिवाळी झाली, तेथे तेल्याच्या घरातली विक्रमाची मेडमुरकी आणि तान सुरावट साऱ्या नगरात घरोघर स्पष्ट ऐकू गेली, तर त्यात नवल कसले?
तात्पर्य, ग्रहदशा अनुकूल नसता एखादा मोठा पट्टीचा गवयी घरोघर ताना ठोकीत जरी हिंडला, तरी त्याच्यावर मूठभर तांदळाचीही मेहरबानी करायला कोणाला सुचायचे नाही. पण अनुकूल काळात सहज कोणी स्वतःच्या घरात नुसता शिंकला तरी `ओ हो हो हो! काय ही भैरवीची तान` म्हणून सारे लोक तेथे जमतील. प्रतिकूल काळात थोड्याशा गरजेसाठी साऱ्या गावात जोडेफाड केली तर जोड्याच्या टाक्यापुरतीही कोणी दाद घेत नाही. पण तोच काळ पालटला की हजार मैलावरचे `रसिक` घ्या म्हणून शोध करीत येतात. दुनियेचा बाजार असा उलट्या पावलाचा आहे!
गवईबुवांचा शोध करून दासी परत आल्या आणि राजकन्येला म्हणू लागल्या, खो खो हासत सांगू लागल्या की, `ताईसाहेब, काही वर्षापूर्वी चोरीच्या आरोपावरून हातपाय तोडून गावाबाहेर टाकून दिला होता ना?`
जो तस्कर तेलियाच्या गृहाप्रती । घाणा हाकीत बैसला ।।
तोचि करीत आहे रागरंग । परि स्वरूप दिसताहे बेढंग ।
जैसे का ते शिमग्याचे सोंग । ऐसियापरी दिसताहे ।।
इतके वर्णन ऐकून एखाद्या राजकन्येने फारफार तर या शिमग्याच्या सोंगाची कीव करून, त्याच्या एक दोन बासनातल्या चिजा ऐकण्यासाठी त्याला आमंत्रण दिले असते. पण येथे पहावे तो प्रकार निराळाच!
मग पद्मसेना म्हणे साचारं । तरी घेउनि या तो तस्कर ।
जीवे भावे करीन भतार । वेध लागला अंतरी ।।
दीपराग आळवला तो काय आणि राजकन्या फिदा होते काय! या पोरीचे पाणिग्रहण करायला कितीक तरी तारुण्याळलेले राजे लाळ घोटीत असतील, पण अखेर स्वयंवराचा प्रसाद कोणाला? सोग बनलेला असा एक उपटसुंभ गवई! गावातल्या गवयांनी ही बातमी कळताच, वैरागाच्या झटक्यात तंबोऱ्यावर डोकी आपटून त्यांनी आत्महत्या आणि रागहत्या एकदमच केली असावी, असा माझा तर्क आहे. बाहेरच्या भुरट्या गवयाची गावात पंचारती झाली की गावकरी गवयांना पंचप्राण हत्येच्या वेदना होतात, असा तानसेन स्मृतीचा दाखला आहे.
राजकन्येने विक्रमाला आपल्या एकखांबी महालात आणले. तेथे त्याची उत्तम बडदास्त ठेविली. सारा दिवस-रात्र विक्रम बुवांचे रागदारीचे जलसे सुरू झाले. बुवा गाणार आणि बाई ऐकणार! असे सहा मिहने जाताच, साडेसातीची साडेसात वर्षे पूर्ण झाली. `राजकन्येच्या एकखांबी माडीवर अलीकडे हा संगीत जलशांचा धुमाकूळ कसला चालला आहे? काय हिने एखाद्या नाटक मंडळीला आप दिला आहे, की हीच मोगरी एखाद्या चाफ्याच्या गळ्यात पडली आहे? आहे तरी काय भानगड` म्हणून चंद्रसेन राजाने पद्मसेनेच्या दासीजवळ चौकशी केली. त्या काय टवाळ सटव्या स्पष्ट बोलणार?
पद्मसेनेचा विचार । आम्हा सांगता न ये साचार ।
म्हणोनि तेथे चलावे सत्वर । मग जे करणे ते करावे ।।
राजा ताबडतोब एकखांबी महालाकडे निघणार होता. पण इतक्यात त्याला एक फार जरूरीचे काम पडले. त्याला झोप आली, म्हणून तो निजला. इकडे विक्रमाचा घाणा सुटला आणि तंबोरा नशिबी लागला. घाणा कधी सुटेल? ही विवंचना मागे पडून, ही तंबोऱ्यावरची घसाफोडी कधी सुटणार, या चिंतेत तो मग्न होता. घाणा परवडला, पण हा तंबोरा नको. घाणा तिळाचे तेल पाडीत होता, पण तंबोरा नरड्याची चरबी गाळीत होता.
साडेसाती नंतर शनीची खास मुलाखत
राजा मनी चिंता करती । म्हणे केव्हा उज्जनी होईल प्राप्त ।
क्लेश भोगिले अत्यंत । परी कृपा न करी ग्रहस्वामी ।।
ऐसा राव चिंता करित । तंव तेथे काय वर्तली मात ।
शनिदेव होऊनि कृपावंत । सन्मुख उभा ठाकला ।।
कवि तात्याजी महिपतीने विक्रमाच्या साडेसाती काव्याची जी मूळ स्वतंत्र कल्पना निर्माण केली, ती येथे संपूर्ण झाली. या पुढील सारा मजकूर लिहिण्यासाठी त्याला पौराणिक भारूडाचीच कास धरणे भाग पडेल. शनि प्रसन्न होऊन विक्रमासन्मुख उभा ठाकणे, त्याने आपल्या पराक्रमाच्या सर्व जुन्या कथा विक्रमाला श्रुत करणे, त्या कथांच्या जंत्रीत सगळ्या देवदानावांपासून तो थेट रामकृष्ण हरिचंद्रापर्यंत सर्वांची खोडकी जिरविल्याची घमंड मारणे आणि `सर्वात मी शनि श्रेष्ठ, माझा धाक साऱ्या त्रिभुवनाला, माझ्यापुढे हे विश्व म्हणजे कःपदार्थ` ही पौराणिकी परंपरेची प्रतिष्ठा प्रसिद्ध करणे, वगैरे मामली पुराणी प्रकारच तात्याजी महिपतीने कथन केले आहेत. गणेशपुराणात गणपती श्रेष्ठ, बाकी देव कुचकामी. शिवपुराणात शिव श्रेष्ठ, बाकी देव फोलकट. देवी पुराणात, देवी थोर, बाकीचे पुल्लिंगी देव सारे खापऱ्याचौर, ही जी पुराण लेखकांची जुनी खोड, तोच अखेर तात्याजी महिपतीलाही पत्करावी लागली.
आधीच हिंदुस्थानातल्या हिंदूंच्या बोकांडी तेहतीस कोटी देवांची फलटण गांधीलमाश्यांप्रमाणे डसलेली आहे. त्यात पुन्हा शैववैष्णव, जैन-लिंगायत, वेदिक भागवती वगैरे वादांची पानपते नित्य घुमश्चक्री घालीत असतातच आणि त्यातच प्रत्येक पुराणातल्या आणि माहात्म्यातला `हीरो` स्वतःच्या सर्वश्रेष्ठत्वाचा ताशा चौघडा बडवू लागला की `आता व्हट्ट द्यावं तरी कोण कोणाला?`
असा विलक्षण इलेक्षनी पेच वाचक-भगतांपुढे पडतो. बोलून चालून हे `शनिमाहात्म्य` तेव्हा त्यात कवीने शनीचे सर्वांगीण स्तोम न माजवावे, तर कोणाचे? इलेक्शनच्या हंगामात प्रत्येक उमेदवार झब्बूचे पोवाडे गाण्यासाठी जसे शेकडो पोटाळ पंडित टोळधाडीप्रमाणे खेडोखेडी त्या झब्बूचे तुणतुणे वाजवीत फिरतात, तसेच हे माहात्म्य-लेखक आपापल्या माहात्म्य-देवाचे ढोलके बडवितात. ह्यापेक्षा त्यात विशेष काहीच नाही. सर्व पुराणांचे आणि माहात्म्यांचे कुंभार माणसेच असल्यामुळे, त्यांच्या निरनिराळ्या लहानमोठ्या मडक्यांच्या घाटात माणसांचा माणूसघाण्येपणा उतरला नाही, तर मग कुंभाराची कुशलता काय कामाची? माणसे जशी एकमेकांना पाण्यात पाहतात, आत्मस्तोमासाठी दुसऱ्याला पाण्यापेक्षा पातळ करतात, स्वतःच्या मानमान्यतेसाठी दुसऱ्याविषयी कुझकट कुचाळ्यांचा कलकलाट चालवितात, तोच कोंबडझुंजी मामला निरनिराळ्या देवांच्या माथी मारून माणसांनी पुराणग्रंथांची पैदास केलेली आहे.
शनीने आपल्या आत्मस्तोमी पराक्रमांच्या ज्या लहानमोठ्या कहाण्या आपल्या खास मुलाखतीत विक्रमाला श्रुत केल्या, त्यांचा परामर्ष आपण मागाहून घेऊ. सध्या, विक्रम उज्जनीला जाण्यासाठी फार उतावीळ झालेला आहे, तेव्हा त्याच्या दैवलीलेच्या नाटकाचे अखेरचे प्रवेश प्रथम चर्चेला घेऊन, त्याला मोकळा करावा हे बरे. प्रत्यक्ष शनिदेव समोर येताच, त्याने विक्रमाला विचारले, `काय शहाण्या (अज्ञाना) मला ओळखलं का नाही? माझा इंगा तुला समजला का नाही?` हातपाय तुटलेले असल्यामुळे त्याला नमस्कार करवेना, म्हणून विक्रमाने त्याच्यापायी लोळण घेतलं.
तेव्हा शनि म्हणे विक्रमा । धन्य धन्य तुझा महिमा ।
आता मी प्रसन्न राजोत्तमा । इच्छा असेल ते माग ।।
शनीला वाटले की विक्रम आता राज्य मांगेल, हातपाय मागेल, इंद्राचे ऐश्वर्य मागेल. पण त्याची कल्पना उच्च जनीच्या विक्रमाने सपशेल खोटी पाडली. उच्च जनीचा विक्रम नेहमी परार्थी असतो. स्वार्थी नसतो. परार्थापुढे तो त्रिभुवनाच्या साम्राज्यप्राप्तीलाही कवडीमोल मानतो, शनीने इच्छावराची संधी देताच,
तंव विक्रम सद्दद बोले वचन । मनुष्यदेहा न पीडी जाण ।
हेचि द्यावे मज दान । कृपाळुवा शनिदेवा ।।
म्यां दुःख सोशिले अनिवार । ऐसे प्राण्यासि नाही सोसणार ।
तरी तूं कोणासी न पीडी साचार । हेचि मागणे शनिदेवा ।।
विक्रमाने एवढाच वर मागताच शनि चारीमुंड्या चीत झाला. मनातल्या मनात ओशाळला.
"विक्रम तुझी धन्य असो. परपीडेचा अनुभव तुझ्याच हृदयाला टोचलेला पाहून, मी फार खूष झाली. तुझी भूतदया काय वर्णू? तू हातपाय मागत नाहीस. आणि राज्यछत्राचीही आठवण करीत नाहीस. मात्र परदुःखनिवारणार्थ तुझी सारी तळमळ! शर्थ असो तुझ्या सत्त्वाची आणि माणुसकीची. विक्रमा, तुला प्रत्यक्ष ईश्वरच म्हटले पाहिजे."
राजकन्येच्या मांडीवर । विक्रमासि भेटले शनैश्वर ।
तेव्हां रायाचे दिव्य झाले । शरीर जैसा सूर्य प्रगटला ।।
विक्रमाने जो वर मागितला त्याने शनीच्या शनिमाहात्म्याच्या नाड्याच पुण्या आखडून टाकल्या, वर तर पुरा केलाच पाहिजे. `न पीडी प्राणिमात्रासि` हा वर शनीजवळ मागणे, म्हणजे बाबू चष्मावाल्याकडून किंवा काबुली पठाणांकडून `दरवडे घालू नका` असा वर मागण्यासारखे होते! खादाड मावशी, कशी राहील उपाशी?
धंदेवाला चटक्या चोर, मेला तरी होणार नाही साधू थोर. घातपातांचा अग्रणी, त्याचे नाव पडले शनि. वर द्यावा तरी पंचाईत, न द्यावा तरीही पंचाईतच! प्राणांतिक प्रसंगातसुद्धा विक्रमाने सर्वस्वावर लाथ मारून माती लोटली, पण सत्त्वाला पारखा झाला नाही. आता तर त्याने शनीच्याच सत्त्वावर जप्ती आणली! प्राणिमात्रास छळायचे नाही, तर मग शनिला दुसरा धंदा तरी कोणता उरला? धंदेबाज ठगाच्या हातचा फासच हिसकून घेण्यासारखा हा इच्छावर नव्हे काय? शनीची ही अडचण तात्याजी महिपतीने बिनबोभाट सफाईत सोडविली. त्याने शनीशी संगनमत करून आपल्या पुस्तकाचा प्रसार आणि शनीचा विक्रमाला वर या दोघांची बिनतोड सांगड घालून एका धोंड्याने दोन पाखरे मारली कशी ती पाहा -
तेव्हां प्रसन्न झाला शनैश्वर । रायासि देता झाला नजवर ।
हा ग्रंथ * श्रवण पठण करी जो नर । तयासि पीडा न करी मी ।
भावें करिता श्रवण पठण । आदरें ग्रंथसंरक्षण ।
त्यांसि रक्षी मी रात्रंदिन । कृपा करीन सर्वथा ।।
(*म्हणजे तात्याजी महिपतीकृत ३८८ ओव्यांचे मराठी शनिमाहात्म्य!*) परंतु
जो का श्रवण पठण न करी । आणि ग्रंथाची हेळणा करी ।।
तया नराच्या शरीरीं । पीडा फार करीन मी ।
सध्या जाहिरातीचे युग चालू आहे. ताईत, गंडे, दोरे, मंत्रचिठ्ठीवाल्यांपासून तो थेट शब्दापुढे शब्द ठेवून ‘ग्रंथकार` बनणाऱ्या कलमदान्यांपर्यंत सर्व लोक आपापल्या मालाच्या जाहिराती देताना, सवलतींची, फायद्यांची, सर्टिफिकीटांची, रामबाणपणाची सर्वोत्तमपणाची पुष्कळ वाचाळ पंचविशी करतात. पण तात्याजी महिपतीने आपल्या शनिमाहात्म्याच्या प्रसारासाठी योजिलेली जाहिरातीची `युगत’ जगात आजपर्यंत एकाही जाहिरात विद्यापटूच्या कल्पनेला शिवलेली दिसत नाही. आज हिंदुस्थानात, विशेषतः मराठी भाषेच्या महाराष्ट्रात, तात्याजी महिपतीच्या शनिमाहात्म्य चोपड्याचा इतका प्रसार आहे, की दरसाल लक्षावधी प्रति छापूनही मागणीचे तोंड बंद पडत नाही. तुझी विक्री जास्त का माझी विक्री जास्त, म्हणून सर्टिफिकेटी कुतरभुंक करणाऱ्या मुंबईच्या भांडकुदळ आंग्ल दैनिकांना आमच्या शनिमाहात्म्याच्या प्रसाराचा रामटोल्या कचका अजून कळला नाहीसे दिसते!
बदलत्या काळाचे बदलते देखावे
काळ एक मोठा किमयागार आहे. केव्हा तो कशा सोन्याची माती करील आणि मातीचे सोने करील, याचा थांग लागत नाही. एखाद्या मनुष्याला तो निष्कारण महत्पदाला नेईल, तर दुसऱ्याच घडीला त्याला जगात तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही. केव्हा कोणावर कसला मुखवटा चढवून त्याच्या हातून खाटकाचे काम करवील, तर कधी त्याच खाटकाकडून साऱ्या मानवतेला संजीवनीची फुकट खैरात करवील. सहज सुईच्या अग्राने लक्षावधी लोकांची अंतःकरणे चिरफाड करणारा हाच आणि कसलाही उपाय न करता केवळ पाठ फिरवून दुभंगलेली हृदये अभंग जुळविणारा हाच. अवघ्या नवग्रहांच्या भिन्नभिन्न गुणधर्माची माया काळाच्या उदरात सामावलेली असल्यामुळे, या जगद्रंगभूमीवरील सर्व बऱ्या-वाईट, छोट्या-मोठ्या नाटकांचा सूत्रधार हाच होय. विक्रमाची ग्रहदशा बदलताच या सूत्रधाराने कसकसले ट्रान्सफर सीन (दलते देखावे) निर्माण केले, तिकडे आता वाचकांनी सावधान ठेवावे.
विक्रमाचा देह नितांत सुंदर करून शनीने त्याला आशीर्वाद दिला व तो स्वस्थानी गेला.
(काळ प्रतिकूल असता प्रत्यक्ष मदनाचे पुतळेसुद्धा लोकांच्या दृष्टीला तिरस्करणीय आणि किळसवाणे दिसतात; आणि काळ अनुकूल होताच खेकडतोड्या पिचकण्या प्राणी लोकांना सुंदर दिसू लागून, काळ्याकुट, नकट्या, फेपट्याच्या सरळ नाकाची स्तुती करायला लोकांचा आनंद त्यांच्या जीवनातच काम, पण गगनात मावेनासा होतो!) इतक्यात चंद्रसेन राजा तेथे आला, पाहतो तो एक `मदनाचा पुतळा ।` बाप आलेला पाहताच पद्मसेनेने गांधर्व पद्धतीने विक्रमाला आपले पाणिदान केले आणि त्यानेही
गृभ्णामि ते सुप्रजास्त्वाय हस्तम् ।
मया पत्त्या जरदष्ठिर्यथासः ।।
भगो अर्यमा सविता पुरन्धिः ।
मा त्वा दुर्गार्हपत्याय देवाः ।।
या प्रतिज्ञेने तिचे प्राणिग्रहण केले. चंद्रसेनाने आपल्या जावयाला विचरले की, `महाराज आपण कोण?`
विक्रम वदे साचार । मी तुमचा असे चोर ।
श्रीपति वैश्य सावकार। बोलावा आधी तयासी ।।
आमंत्रण जाताच ताबडतोब वैश्य सावकार तेथे धावून आला. आपण `चोर` ठरविलेला आदमी इतका `थोर` बनलेला पाहून, त्यालाही फार अचंबा वाटला. वैश्याच्या आग्रहावरून सर्वजण त्याच्या घरी चित्रशाळेची तपासणी करायला गेले, तो तेथेसुद्धा अचंबाच!
तंव चित्रींचा निर्जीव हंस । जेणे गिळिले होते हारास ।
तो पुन्हा उगाळी सावकाश । जैसा होता तैसाचि ।।
भिंतीवरच्या चित्राने वैश्यकन्या अलोलिकेचा मोत्यांचा हार जशाचा जसा ओकून परत टाकलेला पाहून,
जन म्हणति अघटित कळा । निर्जीव लेपें हार गिळिला ।।
दोष लाविला महापुरुषाला । ते आजि कळू आले ।।
लोक म्हणजे काय? सहस्रमुखी शेषाचे बाप. हजार वेळा हजार प्रकारचे उद्गार काढणारी त्यांची हजार तोडे! केव्हा काय बोलून कोणा कसा खाड्यात घालतील, आणि कोणा नरवंट्याला नरदेव बनवून त्याला डोक्यावर घेऊन नाचतील, याचा नेम नाही. राजे लोकांच्या मनोवृत्तीला आपण वारांगनेची उपमा देतो. पण नीट विचार केला तर ह्या उपमेपासून लोकमताचीही सुटका होत नाही.. लोकमताच्या चवचालपणाचे थेर कोणत्या थराला जातात, याचे दाखले सध्याच्या हिंदी राजकारणाच्या क्षेत्रात हवे तितके दिसून येतात. हाराचा आरोप खोटा ठरताच, श्रीपती वैश्य सावकाराने विक्रमाचे `क्षमस्व` म्हणून पाय धरले आणि आपली कन्या त्याला अर्पण केली. (खांबाला बांधून दिलेला कणक्या चोप व्याजात वळता करून घेतला!)
चंद्रसेन पुसे विक्रमासी । आपण राहता कोणे देशी ।
कोण नाम कोणवंशी । जन्म तुमचा सांगावा ।।
तंव विक्रम म्हणे चंद्रसेना । काय पुससी विचक्षणा ।
मी असे उज्जनीचा राणा । नाम माझे विक्रम ।।
`मी उज्जनीचा चक्रवर्ती राणा विक्रम` इतके शब्द ऐकताच घमंडानंदन चंद्रसेनाला जवळजवळ झीटच आली. अरे बापरे! केवढे हे जाडी प्रकरण आणि आपण त्याची काय विटंबना केली! `महाराज या दासाला क्षमा असावी. माझ्या हातून फार घोर अन्याय घडला.` असे म्हणून स्वारीने विक्रमाच्या पायावर लोळण घेतली. `आपण उज्जनीचे विक्रम चक्रवर्ती. इतके आपण आधीच कळविले असते, तर घडला अनुचित प्रकार झाला नसता.`
Of all sad words of tongue and pen, The saddest are those, `It might have been`
चित्ता उपजविती खेद । बोलता लिहिता जेजे शब्द ।
तयामाजी अत्यंत दुःखप्रद । `असे झाले असते` हे ।।
(उपरोक्त आंग्लोक्तीचे कै. हरीभाऊ आपटे कृत भाषांतर)
हा जगाच्या व्यवहाराचा साळसूद न्यायच आहे. त्या वेळी जरी विक्रमाने खरी परिस्थिती स्पष्ट सांगितली असती, तर त्यावर विश्वास टाकण्याइतका एकही शहाणा विवेकाधीन नव्हता. उलट, थोरामोठ्यांचे नाव सांगून चोऱ्यामाऱ्या करणारा लफंगा (इंपोस्टर) म्हणून हातापायाच्या बरोबरच मुंडकेही छाटण्याची इंडियन पीनल कोडी गाजवायला या शहाण्या चंद्रसेनाची न्यायबुद्धी बाचकली नसती. शिवाय, विक्रमाने आपले नाव, गाव सर्व हकिकत त्या धनाशेट्या वैश्याला प्रथमत:च स्पष्ट कळविली असताही, त्याने तरी काय असा मोठा विवेक दाखविला, तर चंद्रसेनाच्या आताच्या मामुली सबबीची विक्रमाने फारशी पर्वा करावी! विक्रमाने खडखडीत जबबा दिला की, `मेहरबान, झाले ते झाले.
आता हे नक्राश्रू कशाला? तुमच्याकडे कसलाही दोष नाही. हा सारा आमच्या ग्रहदशेचा परिणाम. तुम्ही लोक शनिदेवाच्या नाटकातल्या कळसूत्री बाहुल्या. त्याने नाचविले तसे नाचलात. घेतलेल्या भूमिका उत्तम वठविल्या. आता त्याचे काय? त्यावेळी ग्रह प्रतिकूल होते, म्हणून तुझी बुद्धी तशी वागली. आता तेच ग्रह मला अनुकूल झाल्यावर तुम्ही आता ही पश्चात्तापाची भाषा बोलू लागला. ठीक आहे. मला पूर्वी काही घडल्याचे दुःख नाही, आणि आता होत आहे त्याचे सुखही नाही... सुखदुःखाचा माझा जमाखर्च नेहमीच शून्य असतो. प्राणान्तिक आपत्तीतही मी माझ्या सत्त्वाला पारखा झालो नाही, यातच मी माझ्या उज्जनीचे नाव राखले.`
नंतर सर्वत्र मोठमोठे उत्सव सुरू झाले, मेजवान्या झडू लागल्या, दानधर्माचा मुसळधार पाऊस कोसळू लागला. पण सत्त्वधीर विक्रम आपल्या खऱ्या पुरस्कर्त्याला विसरला नाही.
मग तो तेली बोलविला । विक्रमे तयासी नमस्कार केला ।
एक देश तथा देवविला । सुखी केला तये वेळी ।।
विक्रमाने दाखविलेले हे कृतज्ञतेचे उदाहरण म्हणजे त्याच्या सात्त्विक मनोवृत्तीचा नितांत मधुर परिपाकच होय. खरा मानवधर्म म्हणतात तो हाच. बाकीच्या धर्माच्या व्याख्या नाटकी आणि खोट्या आपत्काली उत्तेजनाचा, धीराचा किंवा करुणेचा एकच गोड शब्द बोलणारा जर आपल्याला देव वाटतो, तर वारांगनेची, राजमताची आणि लोकमताची दिक्कत न बाळगता, जो संकटकाळी आपल्याला आपणहून धरतो, त्याला परमेश्वर समजले पाहिजे. एरवी अनुकूल काळात तोडचोंबडेपणा करणारे इष्टमित्र सगेसोयरे ढेकणा चिलटा इतके उमाप भेटतात; पण प्रसंग पडला की एक सुद्धा उपयोगी पडत नाही.
मोका पडे बाका । तो गद्धेको कहना पडता काका ।।
अशी एक म्हण आहे. पण प्रसंगी गड्याला सुद्धा काका म्हणून हाक मारली तरी तो जवळ उभा राहत नाही. जगाच्या असल्या उलट्या काळजाच्या व्यवहारात, कठीण काळी जो उपयोगी पडले, तोच खरा माणूस! बाकी माणसे म्हणजे जगाच्या लोकसंख्येची भरताड. विक्रमाला सर्वांनी झिडकारले पण त्या मातृहृदयी तेलिणीने त्याला आपंगिले. तिच्या सासऱ्याने त्याचा योगक्षेम चालविला. या सून सासऱ्याची महती किती वर्णावी? महात्मे ते हेच. शनिग्रह जातीचा तेली असो, नाही तर कोणी असो; तेलीजात किंवा कोळीजात म्हणजे शनिवृत्तीची असते, असा काही तात्याजी महिपतीचा कटाक्ष खास नाही, हे या उदाहरणावरून स्पष्ट सिद्ध होते.
ब्राह्मणबुवांत पुष्कळ मांग असतात, आणि पुष्कळ मांग ब्राह्मण असतात. हिंदूंच्या जातिभेदाच्या दुर्बिणीतून पाहून, या तत्त्वाचा गाभा उमगणे कठीण आहे. उदारचरित ही कोण एका विशिष्ट जातीची सनदी जहागीर नव्हे. ती सर्व मनुष्यप्राण्यात सर्वत्र हिरे माणकांप्रमाणे आढळते. एवढेच, की शैले शैले न माणिक्यम् मौक्तिकम् न गजे गजे. एकाच आईच्या उदरातून जन्मले म्हणून काही भाऊ बहिणीचा जिव्हाळा उत्पन्न होत नाही. त्या जिव्हाळ्याचा झरा जन्मजन्मार्जित पूर्वकर्मार्जित व पूर्वकर्मार्जित असावा लागतो. असा किती भावा बहिणीत आढळतो? पाठची बहीण हाडे फोडण्यात मांगिणीला शरम आणते, तर मांगवाड्यातली मांगीण आपत्प्रसंगी बहिणीच्याच काय पण जन्मदात्या आईच्या प्रेमाला `मागे सर` म्हणते. जिव्हाळ्याच्या या मानवधर्मात जातपात, नातेगोते आतडीकातडी यांचा मुळीच संबंध येत नाही.
कोण मनुष्य कोठे `मेरा प्यारा भाई` म्हणून येऊन मिठी मारील आणि कोण मावली कोठे आईच्या उमाळ्याने आपल्याला पोटाशी धरील किंवा बहिणीच्या प्रेमाने भाऊबीज साजरी करील, याचा नियम नाही. आपत्प्रसंगीच शत्रुमित्रांची पारख होते. भावाबहिणीचा परिचय होतो. लोकव्यवहाराचे प्रवाह उमगतात, आणि आणि आणि विशेषतः आत्मा आणि परमात्मा, जीव आणि शिव, ह्यांच्या अन्योन्य संबंधाचा ऋणानुबंधाचा उलगडा होऊन, साऱ्या जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी निवळते! ओम श्रीहरी!
एक महिनाभर जावईपणाचा थाटमाट भोगून विक्रमराजा चतुरंग दळ सिद्ध करून, दोन नवीन राण्या, हत्ती, घोडे, दासदासी वगैरे सह उज्जनीला परत आला. नागरिकांनी नगर शृंगारून मोठा उत्सव केला आणि
सुमुहूर्त पाहोनि । विक्रम बैसविला सिंहासनी ।।
याचक तृप्त केले दानी । चिंता चित्तीं असे ना ।।
सर्वत्र आनंदीआनंद झाला. तसा तो प्रस्तुत ग्रंथाच्या वाचकांनाही सदैव लाभो, अशी श्रीहरीजवळ याचना करून, मी पुढे प्रयाण करतो. आता आपण
शनीने सांगितलेले शनिमाहात्म्य
काय आहे, ह्याची चिकित्सा केली पाहिजे. `प्राणिमात्रास पीडा देऊ नको` अशी जेव्हा शनीजवळ विक्रमाने मागणी केली, तेव्हा शनि त्याला आत्मस्तोमाच्या फुरफुरीने "अरे बेट्या विक्रमा, तुला मी दिलेले दुःख काय घेऊन बसलास? तुज दुःख दाविले किंचित. माणसांची गोष्ट कशाला? मी तर अनेक देव दैत्य ग्रहांनासुद्धा चांगले उलटसुलट `तासून` काढले आहेत. कोणीही मनात गर्व धरू नये. गर्वाने कोणी फुगला रे फुगला की मी त्याला धरून हापटलाच खाली! प्रत्यक्ष श्रीशंकराला मी साडेसातीचा दम भरून कैलासात लपून बसायला लावले. अयोध्येचा दशरथपुत्र श्रीराम याच्या राशीला जेव्हा मी आलो, तेव्हा त्याला १४ वर्षे वनवासात पाठविले आणि त्याच्या बायकोला रावणाकडून चोरून पळविले. (शनीच्या मेहरबानीचा खराटा फक्त साडेसात वर्षेच चालतो. मग श्रीरामचंद्राला १४ वर्षाची हद्दपारी आणि वनवास काय म्हणून भोगावा लागला?" `डबल मर्डर` गुन्ह्याप्रमाणे श्रीरामाच्या कुंडलीत दोन शनि होते, का शनीच साडेसातीचे गणित मोजताना चुकला?)
आम्हा नवग्रहांना एक तो रावण मात्र बेटा मोठा खमक्या भेटला. आमच्या पालच्या पाठीवर पलंग ठेवून त्यावर तो निद्रा घेत असे. एकदा नारदमुनी तेथे आले आणि त्यांनी आम्हाला टोमणा मारला, `अरे, तुम्ही मोठे घमेंडखोर श्रेष्ठ ग्रह ना? आणि ही तुमची स्थिती? थुःत तुमच्या जिनगानीवर! तुम्ही नुसते गोरगरिबांचे मात्र काळ. समर्थांपुढे तुम्ही लेंड्याच गाळाव्या. नंगेसे खुदा बेजार, मग तुमचीकाय विमंत? फुकट पुरुषार्थाच्या तुमच्या वल्गना!` मला हा टोमणा जिव्हारी लागला. मी नारदाला म्हटले की आम्ही पालथे पडलो आहो ते उल करण्याची काही युगत करा, मग या शनीचा इंगा कसा पठाणी पिंगा घालील ते पाहा. `वैरियाच्या उरावरी पाय द्यावा` असा कानमंत्र नारदाने रावणाला दिला आणि आम्ही पालथ्याचे उलथे होताच, मी माझी दृष्टी फिरवली मात्र, तो सहा महिन्यांच्या आत श्रीरामचंद्रांकडून रावणाला मी सहकुटुंब, सहपरिवार जमीनदोस्त निर्दाळला.
हरिश्चंद्राची हकिकत तर काय सर्वश्रुतच आहे. त्याला तर मी `बारावा अति ९ स्थानी` आलो होतो. नळ दमयंतीच्या बोकांडी मी बसलो, तेव्हा त्यांचे क्षणात तीनतेरा वाजविले. इंद्राच्या राशीला जेव्हा मी आलो तेव्हा त्याने गौतम मुनीची पत्नी अहिल्या भोगिली आणि त्या ऋषीच्या शापाने इंद्राचा सारा देह कुष्ठाने सडला. चंद्राची स्थिती हीच. त्याने गुरुपत्नीवर हात टाकला आणि स्वतःचे तोंड काळे करून घेतले. वशिष्ठाचे शंभर पुत्र मीच ठार मारले आणि पराशराच्या बुद्धीला डागळून त्याच्याकडून मत्स्यगंधेच्या, आपल्या सुनेच्या, कौमार्याचा भंग मीच करविला. पांडवांचा वनवास आणि दुर्दशा मीच केली आणि कौरवांना रसातळाला नेले ते मीच. अरे विक्रमा, देवदानवांना माझा दरारा तर आहेच आहे, पण `कृष्णं वंदे जगद्गुरुम` म्हणून ज्या पूर्णावतार श्रीकृष्णाची तुम्ही एवढी मोठी थोरवी गाता, त्या पट्ट्याला सुद्धा अस्मादिकांनी पछाडल्याशिवाय सोडला नाही. त्याच्या राशीला मी येताच त्याच्यावर स्पमंतक मणी (कोहिनूर) चोरल्याचा आरोप आला.
ऐसे देवदिकांसि त्रासिले । त्यांत तुजला कांहीसे दुःख दिले ।
किंचित चमत्कारासि दाविले । भजावया तुजलागी ।।
हे सर्व देव, दानव, ग्रह राहू दे. पण गुरुग्रह तर ब्राह्मण ना? विक्रमा ब्राह्मण म्हणजे सर्वश्रेष्ठ. पवित्रापेक्षा पवित्र. त्यात गुरूचे महत्त्व काय सांगावे? `गुरू केवळ माऊली । सदा कृपेची सावली.` पण या माउलीचाही `सवा प्रहरात` मी कसा `मातेरा केला` हे वृत्त तुला तात्याजी महिपतिकृत शनिमाहात्म्यात सविस्तर त होईल. या अंधासारखा ग्रंथ मराठी भाषेशिवाय जगातल्या किंवा हिंदुस्ता कोणत्याही भाषेत कोणाला आदळणार नाही. त्याला मी माझे खास सर्टिफिकीट दिले आहे- (शनिमाहात्म्य फक्त मराठी भाषेतच आहे. गुजराथी, हिंदी, मद्रासी, बंगाली किंवा गुरुमुखी भाषेत याचा पत्ता नाही. या भाषा बोलणारांना मराठी भाषा समजत नाही. शनीची साडेसाती जर सर्व मनुष्यमात्रास भोवते, तर या बिनमराठी भाषकांची साडेसाती टाळण्याचे काहीच शनिवाण साधन शनीने निर्माण केलेले नाही, असे म्हणावे लागेल. शनीची कृपादृष्टी साऱ्या जगात फक्त मराठी महाराष्ट्रावरच विशेष दिसून येते म्हणूनच महाराष्ट्रात `पुणे` आणि `शनिमाहात्म्य या दोन बिनतोड चिजांची खास मेहेरबानी झालेली दिसते.)
हा ग्रंथ करिता श्रवण । सकळ विघ्ने जाती निरमून ।
ग्रहपीडा अति दारुण । न बाधे कदा कल्पांती ।।
श्रवण पठणीं निदिध्यास । लेखक पाठक सर्वांस ।
ग्रंथ संरक्षी तयास । क्लेश विघ्ने न बाधती कदा ।।
ही शनैश्वराची ख्याति । केवळ शनैश्वरांची मूर्ती ।
अहर्निशी जे का ध्याति । त्यांसी संरक्षी शनिदेव ।।
सकळ दुःख दारिद्र्य । येणे निरसेल समग्र ।
भावे श्रवण करिता साचार । फळ प्राप्त तयासी ।।
गीतेत उपनिषदादि मोठमोठ्या ग्रंथांच्या नशिबी जे सर्टिफिकोट लाभले नाही, ते तात्याजी महिपतीच्या `शनिमाहात्म्य` चोपड्याला लाभले ते फक्त मराठी भाषेला मिळाले! त्याची महती फक्त महाराष्ट्रात! केवढे आमचे भाग्य! काय आमची थोरवी शनिदेवाची महाराष्ट्रावर केवढी ही लांबरुंद कृपेची पाखर!एका या शनिमाहात्म्याच्या नुसत्या श्रवणाने अतिदारुण ग्रहपीडा कल्पांतिसुद्धा बाधायच्या नाहीत! लेखक पाठकांनासुद्धा खास ग्रंथाचे व शनीचे पोलीस पोटेक्शन केवळ भावे श्रवण केले पुरे, की दुःख, दारिद्र्याचा निःपात झालाच म्हणून समजावे. असला हा शनिमाहात्म्याचा कल्पतरु किंवा चिंतामणी, अवघ्या एक आण्यात करेदी करून खिशात बाळगिण्याची महाराष्ट्रीय मऱ्हाठ्यांना खास सवलत दिल्याबद्दल शनीचे अभिनंदन करावे, का तात्याजी महिपतीच्या बिनतोड भाग्याचा महिमा गावा, एवढाच प्रश्न सुटावयाचा आहे. परंतु,
दरिद्री चले दरयेकू । करम चले साथ ।
मोतन खातर डुब्बी मारी । तो शंख लगे हात ।।
अशी तर महाराष्ट्रात काही `ग्यानबाची मेख` नाही ना?
****
प्रकरण ९ वे
शनिमाहात्म्यावर शोधनप्रकाश
मागील प्रकरणी शनीने आपल्या माहात्म्याचे जे चुरचुरीत वर्णन विक्रमाजवळ केले, त्याचा कोणीही विचार केला तरी त्याला एकदम हीच कल्पना होईल, की शनीच्या पराक्रमापुढे साऱ्या देव-दानवांनी आणि आकाशस्थ ग्रहांनी सपशेल हात टेकल्यामुळे, शनि हाच अवघ्या विश्वाचा स्वामी परमेश्वर म्हणतात तो हाच. ह्याच्यापुढे कोणाची टाप चालायची नाही की ह्याच्यावर कोणाची छाप बसायची नाही. ह्याने नजर फिरवली की साऱ्या विश्वाचेसुद्धा होळकुकडे आणि तेरा तुकडे व्हायचे. अतिश्रेष्ठ ब्राह्मणवृत्ती ग्रह जो गुरू, त्यानेही `मी गुरू तेज अतिश्रेष्ठ। बरा उपकार फेडिला` असा टोमणा मारून `परि ऐसे कोणा न कष्टावी वाहिले। तुज शपथ माझी ये वेळे।` अशी शनीला शपथ घातली. विक्रमानेही हेच मागणे मागितले. तरी शनिचा शनिपणा आहे. तसाच काय, अशा वर्णनाने भरगच्च भरलेले हे तात्याजी महिपतीकृत शनिमाहात्म्य वाचणारांच्या मनावर काय परिणाम होत असतील बरे? कोणताही ग्रंथ वाचायचा कशाला?
आपल्या ज्ञानात भर पडावी, अंतःकरणात उत्तेजक प्रकाश पडावा आणि निराशेचा अंधार नाहीसा होऊन चित्तवृत्ती प्रफुल्ल व्हावी, एवढ्यासाठीच. साडेसातीची जाहिरात फडकल्याशिवाय आधी कोणी शनिमाहात्म्य हाती घेत नाही. घेतल्यानंतर, त्याच्या पारायणाने वाचकाला काही धैर्य येण्याच्या ऐवजी दिवसेंदिवस तो मनातल्या मनात खचतच जातो. एवढा मोठा उज्जनीचा चक्रवर्ती विक्रमराणा, पण त्याचासुद्धा शनीने चिकण्या चेंदामेंदा केला, माझी काय कथा?
मी कोण कोटच कीटक! जो नुसता जन्मता क्षणीच बापाच्या सूर्यदेवाच्या अंगावर फोड फोडतो, त्याने माझ्याकडे वाकडी नजर केली तर काय जाळपोळ होईल, घातपात होतील, काय नेम सांगावा? ज्याने सर्वश्रेष्ठ गुरूचा सव्वा प्रहरात मातेरा केला, शंकराला कैलासात पळवून, पूर्णावतार श्रीकृष्णालासुद्धा भयंकर आरोपाचे काजळ फासले, तो शनि माझी कणीक कोणजाणे कसकशी तिंबवणार तो! नळ दमयंती आणि हरिश्चंद्र ह्यांच्या आपत्तीची कडेलोट नाटकांच्या रूपाने सर्वश्रुत झालेली आहेच. ही नाटके पाहताना अश्रू ढाळल्याशिवाय घरी परतणारा प्रेक्षक विरळा.
या सत्वधीर पुरुषोत्तमांची हाडे शनीने ठेचून काढली, तर आता माझी अवस्था तो काय करणार? असल्या कल्पनांच्या भाराखाली वाचक अर्धमेला होऊनच, शनिमाहात्म्य- पारायणाच्या फलश्रुतीची, अर्धवट विश्वासाने आणि कच्च्या दिलाने, आशा बाळगून दिवस कंठतो. या पोथीचे सामर्थ्य काय, आणि ती नुसती पोपटासारखी बडबडून होणार काय, याविषयी वास्तविक कल्पना ज्ञान अनुभव, विचार किंवा आत्मविश्वास एकाही साडेसाताळलेल्या वाचकाला असत नाही. नुसत्या पोथीची घोकंपट्टी करून विक्रमाच्या आणि हरिचंद्र नळाच्या आपत्तीचा वज्रप्रहार मला खरोखरच टाळता येईल काय? असाही संशय मधूनमधून त्याच्या भाविक वृत्तीला उंदराप्रमाणे कुरतडीतच असतो. अशा लटपटीत व लंजूर मनाच्या अवस्थेत एकदा का तो पोटभरू ज्योतिषी आणि पोटाळ भटजी यांच्या तडाक्यात सापडला. की मग त्याच्या चरित्राचे आणि चारित्र्याचे जे वाभाडे उडतात ते सांगता पुरायचे नाहीत. आकाशस्थ शनि पत्करला, पण हे देशस्थ, कोकणस्थ शनि नकोत, असा त्याचा जीव मट्ट्याला येतो.
आत्मशोधनाची आणि सत्यशोधनाची प्रवृत्ती शेकडा ९९ लोकांत सहसा नसते. महाराष्ट्रातला बहुजनसमाज आधीच अशिक्षित. जे कोणी साक्षर असतात, त्यांच्यावर ज्ञातेपणाचा आरोपही करणे मुष्किलीचे होईल. `एज्युकेटेड` म्हणविणारांचीही संभावना त्याच पंक्तीत. कोरडा ठणठणीत सबझूटपणा, नाहीतर बाष्फळ वाचाळपणा, यापैकी एखाद्या फांदीच्या टोकावर बसून चिकित्सेची कुऱ्हाड चालवारे महापंडित ते! अर्थात सत्यशोधक प्रवृत्तीच्या अभावामुळे बहुतेक सारे साडेसाताळलेले लोक पृथ्वीवरील या जिवंत शनीच्या हातात शेणगोळ्या, मेणगोळ्याप्रमाणे हवे तसे दाबले, फुगविले जातात.
बाधा शनिची, पण तेल शेंदराचा अभिषेक मारुतीच्या* मस्तकावर काय म्हणून? काय मारुती म्हणजे शनि? का शनीचा वकील? का पृथ्वीवरील एजंट? (बिचाऱ्या ब्रह्मचारी मारुतीवर त्याच्या भगतांनी इहलोकी भयंकर अत्याचार चालविलेले आहेत. त्यांनी त्या दिव्य उदारचरितात महाक्रूर शनीशी तर नसती सांगड घातलीच आहे, पण वांझोट्या बायांनी अपत्यप्राप्तीसाठी त्या चिरंजीव ब्रह्मचाऱ्याला दररोज प्रदक्षिणा घालघालून अगदी उठवणीस आणला आहे. आजन्म ब्रह्मचाऱ्याजवळ अपत्यप्राप्तीची याचना करणाऱ्या बाया-बुवांना मनाची नसली तरी जनाचीही लाज वाटेनाशी झाली आहे.)
शनिचे चरित्र काय, मारुतीचे चरित्र काय, कशास काही मेळ? पण असला एकही प्रश्न बिचाऱ्या शन्याळलेल्या दिङ्मूढ प्राण्यांना कधी सुचायचा नाही. श्रीरामभक्त ब्रह्मचारी मारुतीरायाच्या भजन, पूजनाने समर्थ रामदासांनी अवघ्या महाराष्ट्रात दिव्य आत्मशक्तीचे चैतन्य आरपार थरारून सोडले आणि सारा देश अक्षरशः `समर्थ` केला. मारुतीरायाच्या संप्रदायानेसुद्धा असे तेजाळ ओजस्वी वाङ्मय निर्माण करून ठेविले आहे की त्यातील `भीमरूपी महारुद्रा` हे स्तोत्र आणि `सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी` ही आरतीच जरी नुसती म्हटली तरी निराशा आणि कुकल्पनांचे खड खड मुर्दे पडून, मनुष्याचा आत्माराम आत्मसामर्थ्याच्या दिव्य चैतन्याने बुभुःकार करू लागतो. कोठे ते बजरंग बली मारुतीरायाचे तेजस्वी वाङ्मय आणि कोठे हे शनिमाहात्म्याचे पातड! कशास काही मेळ? तात्पर्य, तात्याजी महिपतीकृत शनिमाहात्म्याच्या पारायणाने पाठक श्रोत्यांच्या आत्माराम जागृत तर होत नाहीच, पण उलट तो निराशेच्या आणि कुकल्पनांच्या काळ्याकुट्ट अंधारात मात्र अधिकाधिक गुरफटतो. आधीच मुळी शनिमाहात्म्य म्हणजे काल्पनिक काव्य. त्यांतील एकही गोष्ट खरी नव्हे. सगळ्या व्यक्ती आणि सगळा तपशील म्हणजे केवळ कविच्या कल्पनेचे कागदी पत्त्याचे किले. जसे हरिश्चंद्राचे चरित्र काल्पनिक कथा, तशीच ही विक्रमाची कहाणी कादंबरी. कमाल कठोर आपत्तीच्या तुफआनात सत्वधीर मनुष्याने आपल्या सत्त्वरक्षणासाठी स्वार्थत्यागाची किंबहुना आत्मयज्ञाची किती निर्वाणीची शिकस्त करता येणे शक्य आहे, याची कवींनी ही दोन उत्तम कल्पनाचित्रे रंगवून तयार केली. यापेक्षा त्यात विशेष काही नाही. त्यात बोध पुष्कळ असेल, पण त्यात मनाला चैतन्य नाही.
आत्मजागृतीचा धक्का नाही, पुरुषार्थाचा संदेश नाही, कसलेच उत्तेजन नाही, येथून तेथून एकजात एकापेक्षा एक वरचढ आपत्तीचे देखावे! `ट्रॅजेडी` (दुःखपर्यवसायी नाटक) मोठी `इफेक्टिव्ह` (परिणामकारक) होते, असे मूठभर आधुनिक विद्वानांचे मत आहे, आणि ते पाश्चात्त्य कल्पनासंकराचे फळ आहे. आद्य नाट्याचार्य श्रीभरतमुनी यांनी भारतीय नाट्यात ट्रॅजेडीला मज्जाव केलेला आहे असे करताना त्यांनी भारतीय मनोवृत्तीचाचांगलाच अंदाज बांधलेला असला पाहिजे खास. आधुनिक मराठी रंगभूमीने ट्रॅजेडी नाटकांचा कितीही परिणाम होत नाही. जरठकुमारी, विवाह निषेधाचे कार्य कै० देवलांच्या आनंदपर्यवसायी शारदा नाटकाने जितके हसतखेळत दणदणीत केले, तितके विधवापुनर्विवाहाचे महत्त्व पटविण्यास कै० गडकऱ्यांची प्रेमसंन्यास ट्रॅजेडी मुळीच परिणामकारक झाली नाही. लोक नाटक पाहतात, थिएटरपुरते हळहळतात, पुढे काही नाही. सगळाच आइस्क्रीम! तात्पर्य, शनिमाहात्म्याच्या पोपटपंची पारायणाने साडेसातीचा फेरा तर टळत नाहीच नाहीत, (कारण त्यात तसे काही सामर्थ्यच नाही) पण उलट मनात निराशेची भीतीची आणि नसत्या संकटांच्या कल्पनांची निष्कारण पोखरण पडल्यामुळे, पावणेआठ बनलेला माणूस आपणच आपली साडेसाती निर्माण करू लागतो. अपायाला उपाय असतोच, तसा तो शनिग्रहाच्या दशेलाही आहे. पण तो उपाय म्हणजे तात्याजी माहितीकृत ३८८ ओल्या मराठी शनिमाहात्म्य मात्र खास नव्हे.
शनिच्या वल्गनांचे वास्तविक रूप
भी गुरूला छळले, मी शंकराला पिळले, मी हरिमंडळाला खोल पिळले, मी श्रीरामाला वनवासात पिटाळले, मी श्रीकृष्णाला बोलबोलता विक्रमा काय कथा? वगैरे ज्या वल्गना तात्याजी महिपतीने शनिच्या तोडी घातल्या आहेत. त्या प्रत्येक देवाच्या व देवीच्या तोडी त्या त्या पुराणकाराने हुबेहूब घातलेल्या आढळून येतात. शनि म्हणतो रामाचा वनवास मीच घडविला. देवीपुराणात देवी हेच म्हणते. अठरा पुराणांचे अठरा देव हे ओरडून सांगतात. तेव्हा खरे कोणाचे मानायचे? पार्वतीने म्हणायचे मी शंकराला चीत केले, शंकराने म्हणायचे मी विष्णूला पादाक्रांत केले. भस्मासुर ओरडतो `हमने तो सब देवदानवोकू गिरीकंदरमे भगा दिया.` अशा या ब्रह्मपोटाळ्यात साधारण वाचकांची सपशेल दिशाभूल होऊन धड कशात काही नाही, असल्या यती भ्रष्टस्तोत भ्रष्टः स्थितीत ते आपल्या भाविक मनोवृत्तीच्या गोधड्यांना शेकडो ठिगळे लावीत बसतात. शैव, वैष्णव वादाची उत्पत्ती याच गोधड्यांत सापडते.
शैवांनी म्हणायचे विष्णू लच्या वैष्णवांनी म्हणायचे शिव पाजी गंजड, शैवांचे गंध, आडवे, तर वैष्णवांचे उभे शैवांनी महाशिवरात्रीचा उपास करायचा तर वैष्णवांनी त्या दिवशी पुरणपोळ्यांवर तुटून पडावे. कांद्याने मात्र वैष्णवांची वकिली रोखठोक बजावून शैवांच्या तोंडा डोळ्यांतून तो रोज पाणी गाळीत असतो. शैवांना कांदा तर हवा, पण बेटा आडवा चिरावा तर विष्णूचे सुदर्शन चक्र निघते आणि उभा कापावा तर शंख हातात येतो. शेवटी शंकराला शंखप्रिय बनवून शैवांचा `आडवा` संप्रदाय, आपत्प्रसंगीचा अपवाद म्हणून फक्त कांद्याच्या बाबतीत `उभा` ठरविला आणि उभा चिरलेला कांदा शंकर शंख म्हणून सेव्य मानला. देवादिकांची पुराणोक्त भांडणे त्यांची भगत माणसे व्यवहारात किती अक्षरशः चालवितात, याचा मासला या शैव-वैष्णव संपदायात चांगलाच पाहावयास मिळतो. असे म्हणतात की, एखाद्या वैष्णवाने शेजारच्या शैवाकडे चूल पेटवायला विस्तव मागितला, तर प्रथम पाणी शिंपडून शुद्ध करून मग तो घरात घेतात असल्या भांडकुदळ भगतांच्या देवांची पुराणे आणि माहात्म्ये किती भांडखोर चढाओढीने लिहिलेली असतात, याचा नमुना शनिमाहात्म्यात चांगलाच उमटलेला आहे.
शिवाय असाही एक विचार सुचतो. सीता-राम, तारामती हरिचंद्र, दमयंती जागांची पाशवी विटंबना केल्याची शेखी जर प्रत्येक देव आणि ग्रह मारतो, तर हे सारे मा काली पठाणांचे बाप की काय? असल्या या गोल्डन गंग यांची माणसांनी काय म्हणून पूजा बांधावी? आणि असल्या या का देवांचे पुराणस्तोम माजवून, हिंदुलोक जगाच्या बाजारात आपली आणि आपल्या धर्मांची काय किंमत ठरवून घेऊ इच्छितात?
शनिने आपल्या कर्तबगारीचे जे माहात्म्य स्वतःच मोठ्या दिमाखाने वर्णन केले आहे. ते अक्षरश: खरे मानले तरी त्यावरून सुद्धा त्याला देवकोटीत ढकलण्यापूर्वी बराच विचार करावा लागेल. सगळ्या देवदानवांच्या आणि समव्यवसायी ग्रहांचा पिच्छा पुरविण्यातच कर्तव्यानंद मानणारा हा शनिग्रह `देव` मानणे, म्हणजे रस्त्यावरच्या शिपुर्चाला पोलीस कमिशनर मानण्याइतकाच मूर्खपणा होईल. राष्ट्राचा व्यवहार चालण्यासाठी आम्ही माणसांनी जशी `सरकारे` निर्माण केलेली आहेत, कायदे ठरविले आहेत आणि त्यांची अंमलबजावणी काढण्यासाठी निरनिराळे छोटे-मोठे हापसर नेमलेले आहेत, त्याप्रमाणे या विश्वाचे विशाळ आणि अनंत साम्राज्य काटेकोर कदरीने चालविण्यासाठी विश्वविधात्याने अशी काहीतरी घटना कशी केलेली नसेल? अलबत केलेली आहे, आणि तो अत्यंत पूर्ण आणि निर्दोष आहे. म्हणून साऱ्या विश्वाचा कारभार बिनबोभाट चालू आहे. विश्वाचा कारभार जर शनिसारख्या घातपात्यांच्या हाती असता, किंवा हेच साऱ्या विश्वाचे प्रजापति असते, तर विश्वचक्राचे कधीच तीनतेरा वाजून ते सांदीला गंजून पडते. पण असे ज्या अर्धी झालेले नाही, त्या अर्थी हे शनिमहाराज स्वतः कितीही लंब्याचौड्या बाता झोकीत असले तरी यांची पायरी विश्वनियंत्रणाच्या कौन्सिलात मुळीच कोठे नसून, तो कौन्सिलहॉलच्या देवडीजवळ कोठेतरी असली पाहिजे खास.
शनिची आत्मस्तोमाची बडबड एखाद्या राजकारणी मुत्सद्याला शोभेशी नसून, ती एखाद्या राक्षसी हृदयाच्या पौजदाराच्या किंवा उलट्या काळजाच्या कारस्थानी पोलिसांच्या तोंडात तर छान शोभते. रस्त्यावरचा सात रुपड्याचा काळ्या कापड्याचा पोलीस, पण त्याच्या तडाक्यात भाजीवाल्या माळणीपासून तो एखाद्या पेनशनर मॅजिस्ट्रेट अगर रावबहादुरापर्यंत जर का कोणी सापडला, तर त्याची विटंबना करण्यात तो शनिचा सख्खा भाऊ बनतो. त्यातल्यात्यात त्यांच्यावर जर एखाद्या भयंकर गुन्ह्याचा आरोप आलेला असेल, तर कबुलीजबाबाचे गुळवेलसत्त्व गाळण्यासाठी अंमलात येणारे पोलिशी प्रयोग प्रत्यक्ष शनिच्या अकलेला मागे सारतात, असा लोकप्रवाद सर्व राष्ट्रांत सर्वश्रुतच आहे.
क्वचित्काळी, आरोपीच्या नैतिक धैयनि पोलिशी शनिजीला न्यायकोर्टाच्या चव्हाट्यावर आल्या, म्हणजे शनिमाहात्म्य कादंबरी नसून, इहलोकांची प्रत्यक्ष वस्तुस्थिती आहे, हा दाखला सर्वांना पटतो. पोलिशी शनिमाहात्म्याच्या चरकातून `सवा प्रहराचा मातेरा` भोगून बाहेर पडलेले स्त्रीपरुष जर आपापले आत्मानुभव लिहून निर्भयपणाने प्रसिद्ध करतील, तर पृथ्वीतलावरील पोलिशी शनिमाहात्म्याची ती बाडे प्रसिद्ध करण्यासाठी दहा ज्ञानकोश कंपन्या चालू कराव्या लागतील. एखाद्या पाषाणहृदयी पोलिसाने किंवा जमादार इन्स्पेक्टरने वाटेल ते अत्याचार केले, म्हणजे त्यांना जाब विचारणारा जगात कोणीच नाही, असे थोडेच आहे? कमिशनरच्या कानावर अत्याचारांची कुणकुण जायची थातड, तो खडाड वरून इंटरचे तडाखे सुरू होतात आणि अत्याचार सिद्ध झालाच तर त्याच शनिदेवांची डोंगरी येरवड्यात खडेफोडीवर रवानगी होते.
इतकेच नव्हे तर, कमिशनरपासून तो थेट रस्त्यावरच्या गणेशटेबला (कॉन्स्टेबल) पर्यंत सर्वजण जर एखाद्या शनिमाहात्म्यात रंगले, तर संबंध पोलीस खात्यात चौकशीचे फिनाईल ओतून दोषी उंदीर पिसवाना यथातथ्य प्रायश्चित्त देणाऱ्या वरिष्ठ सत्तांची चढण एकावर एक थेट खुद्दापर्यंत लागलेली आहेच. सत्यशोधन होऊन न्याय मिळविण्यासाठी एकापेक्षा एक वरचढ सत्तेची योजना राज्यकारभारात असल्यामुळेच, क्षुद्रांतल्या क्षुद्र प्राण्यालासुद्धा आपल्यावरील हकनाहक अत्याचारांची बोंब थेट वरिष्ठांच्या कानापर्यंत पोहोचवून, आपल्या मानवी हक्कांचे स्थैर्य अबाधित ठेवता येते. (बोलून चालून मानवांची कृती म्हणून कितीही दोष असले तरी या बाबतीत ब्रिटिश राज्यकारभार साऱ्या जगात एकमेवाद्वितीयच होय. प्राचीन भारतीय राज्यकारभाराचे कोणी कितीही गोडवे गायिले, तरी त्यात चांद्रसेनी हातपायतोडीचेच प्राबल्य फार असे, हे नाकबूल करण्यात अर्थ नाही. ब्रिटिश राज्यकारभारात व्यक्तीला महत्त्व नसून तत्त्वाची कदर जबरदस्त आहे आणि यातच त्याचे वैशिष्ट्य!
व्यक्तिच्या व्यक्तित्वाला डावलून समष्टीच्या मताने चालणाऱ्या या कदरबाज राज्ययंत्राने गव्हर्नर आणि व्हाईसरॉयसारख्या राजप्रतिनिधींवरही इंपीचमेंटचे खटले करून पापाचे जाब घ्यायला कमी केलेले नाही.) निसर्गत:च मानव चुकीला पात्र असल्यामुळे, त्याची कोणतीही कृती सदोष असणे शक्य आहे. सर्व बाबतीत एक परमेश्वरच तेवढा `परिपूर्ण` (परफेक्ट) आहे, मानव अपूर्ण (इंपरफेक्ट) आहे. मानवांच्या सदोष व अपूर्ण राज्यकारभारात जर एवढी सोय असते तर परमेश्वराची निर्दोष व सर्वागपूर्ण विश्वरचनेची राज्यव्यवस्था किती चांगली असेल बरे? शिपायीबुवा एरवी कितीही गुर्मीने वागले किंवा इन्स्पेक्टर साहेब कशाही घाशीरामाने उन्मत्त बनले तरी एकदा थेट कमिशनपुढे किंवा मॅजिस्ट्रेट एखाने त्यांच्या अत्याचाराची मारली आणि ते प्रकरण वरून खाली आले की त्यांच्या सैतानी घाशीराम्या भसाभसा लागतात. हाच न्याय शनिच्या साडेसातील लावून, जर आम्ही ट दरबारात सणसणीत शंख फुंकून त्याच्या अत्याचाराला पायबंद लागणार नाही का?
‘प्रकरण वरून आले` की बंदोबस्त झालाच पाहिजे. पण आम्ही खुदांना अज्जिबात दखल न देता त्या अत्याचारी शिपायीबुवाचेच पाय रगडीत बसले त्याच्याच माथी ग्रंथाच्या पारायणाची झोड उठवितो. त्याची स्तोत्रे गातो आणि त्याच्या आरतीत कापरासाठी सारे जपान जाळतो. ह्या अनाठायी उपद्रव्यामुळे जास्त शेफारतो आणि `ज्याअर्थी याला शक्य तितका पिळलाच पाहिजे` म्हणून तो त्याला विशेषच छळतो. प्रकरण वर जात आहे, इतका नुसता वास आला पुरे की स्वारीच्या नाड्या आखडल्याच म्हणून समजावे. `असल्या गोट्टी कनाला जावतेस` म्हणून शिपायीयुवा हव्या त्या इसमाला गुरतात आणि आपल्या दिव कर्तबगारीचा त्याच्या पुढे लांब पाढा वाचतात. शनिबुवा हेच करतात. शिपायी आणि शनिबुवा ह्यांचे गोत्र पात्र एकाच उशाचे एकजिनशी मसाल्याचे आहे. ह केवळ विचारसरणी आहे असे नव्हे; तर त्याला ज्योतिषशास्त्राचाही आधार आहे.
वायु तत्त्वाचा, तमोगुणी, जातीचा अत्यंज, रंगाने काळा, उकीरडगावर राहणारा, सर्व प्रकारच्या दुःखांचा कोठारी आणि थंदा शिपायाचा, असे है शनिबुवा आणि शिपायीबुवा समगोत्री कसे नव्हेत?
शनि हा शिपायी असो, नाहीतर शिपायी हा शनि असो, विश्वाच्या आणि मानवाच्या सुराज्यव्यवस्थेला दोघांचीही अत्यंत आवश्यकता आहे. सगळेच पोलीस खाते जर सात्विक साधूंचे संस्थान बनले, तर या जगात भयंकर प्रळय होतील. पोलीसच जर सात्त्विकपणाचा पुतळा बनला तर जगातल्या तामसी तमाशांना पायबंद कोणी, आणि शेकडा ९५ दुष्टांच्या दुष्टपणापासून उरलेल्या ५ सात्त्विकांचे संरक्षण करायचे कोणी?
पुष्कळ वेळा सुक्याबरोबर ओलेही जळले जाते, ही गोष्ट कितीही खरी असली, तरी दुष्टांच्या दुष्कृत्यांचा उच्छेद करायला आणि त्याविषयी इतरांवर कायमची जरब बसवायला पोलीस खात्याची, हवा पाणी अन्नाइतकीच, मानवसमाजाला आवश्यकता आहे. शिवाय, पोलीसखात्याला इतक्या विलक्षण आणि भयंकर गुन्ह्यांचे तपास लावून बिलंदर गुन्हेगारांना शोधून काढावे लागते की पुष्कळ वेळा त्या कामी
त्यांना आपल्या प्राणांवरही तुळशीपत्र ठेवून, समाजस्वास्थ्यासाठी पडेल ते घाडस करावे लागते. पोलीस खाते म्हणजे जगातल्या सर्व गुन्ह्यांच्या घाणीचा बंदोबस्तखाना, अशा खात्यात काम करण्यासाठी कितीही सात्विक मनोवृत्तीचा माणूस गेला, तरी त्याला अखेर आपली मनोवृत्ती शनिइतकीच सवाई तामस बनविल्याशिवाय भागतच नाही. सत्त्वाच्या वृद्धीसाठी तमाचा उच्छेद. हेच ज्या खात्याचे ध्येय, त्यातल्या कामगारांना दिढी दुपटी बिलंद बनविल्याशिवाय गुन्हे आणि गुन्हेगार यांचा शोध करून त्यांचे पारिपत्य करताच आले नसते आणि पोलीसखाते नसते तर माणसाने माणसाला खाल्याशिवाय खास सोडले नसते. मानव समाज सात्त्विकपणाची कितीही वल्गना करीत असला, तरी जात्या तो किती डांबीस आणि दुष्ट असतो, याचे महत्त्वमापन यंत्र म्हणून पोलीस खात्याचे महत्त्व फार आहे.
अनंत विश्वाच्या सुराज्यासाठी परमेश्वराने नवग्रहांकडे जी जी कामे दिली आहेत, त्यात पोलीसखात्याचे किचकट काम शनिला देण्यात आले आहे, आणि हे काम त्याने इतक्या चोख टापटिपीने चालविलेले आहे की त्यात जरा थोडी कोठे आंगचोरीची ढिलाई अगर फुसलावणीची खासगी भलाई कधी झाली असती, तर ह्या विश्वाचा, विशेषतः आम्हा शहाण्या मानवांचा व्यवहार कधीच एळकोटात निघाला असता. प्रत्येक व्यक्तीच्या बऱ्यावाईट कर्माची झाडाझडती घेण्यासाठी साडेसातीचा हंटर कडाडला नसता तर ही मानवी दुनिया एकमेकांना जिवंत फाडून खाऊन कधीच ओस पडली असती.
"या (शनि) ग्रहापासून मिळणाऱ्या अनेक अशुभ गोष्टींमुळे त्याला काळ, यम, Reaper, दुःख, दैन्य, सैतान इत्यादी पुष्कळच गुण व स्वरूपवाचक नावे पडली असून त्यावर कथानके आहेत. स्वतःची मुले भक्षण करणारा म्हणून याला कालभक्षक देव असेही संबोधले आहे. फलज्योतिष वाङ्मयामध्ये `लोभ, मोह, दंभ, मद, मत्सर, सूड, परपीडा, निर्दयपणा, निलाजरेपणा, विषमता, उत्पात, निष्ठूरपणा, निर्धनपणा, दुर्मति` इत्यादी गोष्टीचा कारक शनिग्रह आहे, असे वर्णन आहे. आंग्ल ज्योतिर्विदांनी `रोग, दीर्घकाळ टिकणारे विकार, अडथळे, विलंब (खोळंबा), व्यंग, मृत्यू, दैन्य, दारिद्र्य, पाप, नाश, गुन्हे` इ. यांचा कारक हा ग्रह मानलेला आहे." (श्रीयुत प्रधान कृत जातक मार्गोपदेशिका पृ० २३८) तात्पर्य, शनि हा सर्व ग्रहांत पक्का कवक्या, रेचक्या आहे. याचे गुणधर्म एकजात एकसारखे उत्पातकारकच, असे मुळीच नाही. शनि भयंकर असला तरी शुभंकरही असतो. म्हणजे तो न्यायनिष्ठुर शुद्धि-संघटण्या म्हटला तरी चालेल, पूर्वजन्मार्जित बऱ्यावाईट कर्माची झाडाझडती घेण्याची कामी शनिचे कुदळ खोरे कोनाकोपऱ्यातले अणुरेणूसुद्धा खणून खोदून काढायला कमी करीत नाही. बुटांच्या तळव्यात कोकेनच्या पुड्या, वेबस्टरच्या डिक्शनरीत मॉझर पिस्तुले आणि फणसाच्या पोटात काजूची दारू छपवून, मानवी पोलिसांच्या डोळ्यात कोणी कितीही धूळ फेकली, तरी गतजन्मी निष्पाप कुमारिकेवर किंवा पतिव्रतेवर अंधारात टाकलेला हातसुद्धा या जन्मी खच्ची करायला शनिची न्यायनिष्ठुर कदरबाज करवत एका क्षणाचाही मुलाहिजा राखणार नाही.
न कळतां पद अग्निवरी पडे ।
न करि दाह असें न कधीं घडे ।।
हे तत्त्व प्रतिपादन करण्यासाठी अज्ञेयवादी किंवा साशंक पंडित (अग्नॉस्टिक्स) ज्याला `नेचर` निसर्ग म्हणतात, त्याचेच किंचित् पाल्हाळाने शब्दचित्र काढून ज्योतिर्विद आपल्यापुढे शनि उभा करतात. पुण्यकर्माची पाठ धोपटून, पापाचे भरपूर माप पदरात घालणारी शनिची शक्ती जर विश्वाच्या राज्यकारभारात मुळीच नसती, तर अनवस्थेच्या अत्याचारात सारे विश्व कधीच कोलमडून नापत्ता होते! `जसे करावे तसे भरावे` हा निसर्गाचा दण्डक बिनमुर्वत कदरीने अमलात आणण्याच्या कामी नवग्रहांची योजना झालेली आहे.
प्रत्येक ग्रहाला एकेक विशेष गुणधर्म, पंचतत्त्वांपैकी एकेक विशेष तत्त्व आणि निरनिराळ्या भावनांवर बिनचूक बरावाईट परिणाम करणाऱ्या दशा (=) दिलेल्या आहेत. त्यामुळे कसलेही लहान मोठे, दृश्य-अदृश्य, उघड-गुप्त, कायिक याचिक, मानसिक बरेवाईट कर्म त्यांच्या दण्डकाच्या कदरीतून प्रायश्चित्ताशिवाय किंवा पारितोषिकाशिवाय सुटलेच जात नाही. मंगळाला सेनापतीची आणि शनिला पोलिसाची भूमिका दिलेली असल्यामुळे, या दोन ग्रहांचा कारभार विशेष दणक्याचा होत असतो. त्यातल्या त्यात पापपुण्याच्या झाडाझडतीच्या बाबतीत शनिची `अॅडमिनिस्ट्रेटिव्ह` जबाबदारी फार मोठी.
न्याय अन्यायाची मींमासा
माणसाच्या शोधक बुद्धीने जगाच्या संसारात ज्या विलक्षण घडामोडी घडविण्याचा धूमधडाका चालविलेला आहे, त्याकडे नीट लक्ष पुरविले म्हणजे प्रतिसृष्टी निर्माण करून त्याने खास विश्वविधात्या परमेश्वराला सर्वच बाबतीत तोडीला तोड आणि जोडीला जोड देण्याचा चंग बांधला आहे की काय, असे वाटल्याशिवाय राहत नाही. जमीन पाणी आणि हवा ही तर माणसाची क्रीडांगणे झालीच आहेत, पण वातावरणाच्या अदृश्य लहरींनासुद्धा त्याने हुकमी `मेघदूत` बनवून, आकाशस्थ ग्रह नक्षत्रांना आपल्या कदरबाज कटाक्षात गिरफदार करण्याच्या खटपटी अखंड चालविल्या आहेत. साध्या संसाराच्या राजकारतसुद्धा सत्य-असत्याची उडीद-निवडी चिकित्सा करून, न्याय-अन्यायाच्या मीमांसेत पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करम्याची त्याची अहमहमिका रात्रंदिवस अखंड चालूच आहे. पाप-पुण्याचे रोखठोक निवाडे करून, माणसाचा न्याय म्हणजे परमेश्वराचा न्याय, हे तत्त्व निःसंदिग्ध सिद्ध ठरविण्यासाठी कोर्टे, हायकोर्टे, प्रिवी कौन्सिले, लीग ऑफ नेशन्स वगैरे अनेक भपकेदार जाडजूड संस्थांची पैदास माणसांनी केलेली आहे.
याशिवाय, लोकमत, लोकशाही वगैरे `पाचामुखी परमेश्वरी` नाटकांच्या फार्सेचे जलसे धावत्या सुधारणेने चालवून, मानवांच्या न्यायबुद्धीला थेट पारमेश्वरी न्यायबुद्धीच्या डोक्यावर नेऊन बसविण्याच्या यातायाती एकसारख्या सुरू आहेत. देव मानवांत चाललेल्या या वर्चस्वप्राप्तीच्या शर्यतीत अखेर कोणाच घोडा जिंकणार, या विषयी मानवांचा आशावाद विश्वाइतकाच विस्तीर्ण आणि अनंत असला, तरी सर्वस्वी `अपूर्ण` मानवाला सर्वस्वी `पूर्ण` परमेश्वराच्या काटेकोर न्यायधर्मापुढे अखेर साष्टांग नमस्कारच घालावा लागेल.
लष्करी आणि पोलिसी शक्तीच्या दमदाटीच्या पाठबळावर आणि माणसांनीच लिहून काढलेल्या व नित्य बदलणाऱ्या कायद्यांच्या बुकांच्या उलथापालथीवर पापपुण्याचे निवाडे करण्यासाठी, राजसत्तेचा सोन्याचांदीचा राजदंड टेबलावर आडवा ठेवून आणि अंगावर तांबड्या, पिवळ्या, काळ्या झुली चढवून कोणीही बृहस्पती न्यायाधीश म्हणून न्यायासनावरून खऱ्या-खोट्याचे निकाल देत असला, तरी तो देहमनाने मलमूत्रजन्य माणूसच असल्यामुळे, न्यायाची केवळ नक्कल साधण्यापलीकडे त्याच्या हातून विशेष काहीच घडणार नाही. लोकशाही, लोकमत, ज्यूरी, न्यायाची बिनझुकती तागडी वगैरे सनया तुताऱ्या, शिंगे, शंख फुंकून, माणसांनी न्यायदानाचा कितीही राजमान्य गाजावाजा केला, तरी ईश्वरी निसर्गधर्माच्या न्यायाचा अस्सलपणा मनुष्याच्या केवळ नकलेला साधणारा नाही.
जात्याच मनुष्यप्राणी स्वार्थी असल्यामुळे, त्याच्या न्यायमंदिरातला न्याय नेहमीच कोठे ना कोठे तरी स्वार्थानि डागाळलेला असतोच असतो. विशेषतः जेथे राज्यकर्त्यांच्या मग ते राजेशाही असो, अर्धवट राज-लोकशाही असो, अमेरिकेसारखी झब्बू लोकशाही असो, नाही तर इटली, रशियासारखी दिवाणमुखी मुसोलिनी लेनिनशाही असो, राजकारणाचा विशेष संबंध येतो, तेथल्या खटल्यात राजकारणी स्वार्थाच्या चरकात पुराव्याचे भुईमूग सफाईत चिरडले जाऊन, हुकमी अंदाजाच्या न्यायाचे तेल किती वस्त्रगाळ गाळले जाते, हे चाणाक्ष वाचकांना सांगितलेच पाहिजे असे नव्हे, माणशी न्याय जर काटेकोर अव्यंग असते, तर त्यात अपीलांची लफडेबाजी घुसडून ठेवण्याची जरूरच पडली नसती. फिर्यादीतर्फे पुराव्याच्या उकीरड्याच्या किती गाड्या दाखल करून घ्याव्या, आरोपीतर्फे बचावाच्या किती बालद्यांना परवानगी द्यावी वा न द्यावी, आणि कायद्याच्या प्रत्यक्ष शब्दांच्या अर्थांची किती उलटसुलट लावणी लावावी, वगैरे कायदेबाज पंडितांच्या कज्जेदलाली लीलांचा विचार केला, तर माणशी न्यायमंदिरातला न्याय किती जर्मनसित्वरी असतो, ह्याचा तेव्हाच थांग लागतो. शिवाय मानवी न्याय-अन्यायाची मीमांसा मानवकृत कायद्याच्या चष्म्यातूनच होत असल्यामुळे, हवी तेव्हा हव्या त्या रंगढंगाची काच कळत वा नकळत त्या चष्म्याच्या चौकटीत ढकलून न्यायाधीशाला चकविण्याची किंवा चुकविण्याची चतुराई चपलजिव्ह वकिलाच्या तोंडाचा फेस असल्याने, प्रत्यक्ष खुनी इसम साधुत्वाचे सर्टिफिकीट घेऊन आणि कुप्रसिद्ध गावभवानी अक्षतयोनी कौमार्याची पावती घेऊन, मानवी न्यायमंदिरातून बाहेर पडल्याची उदाहरणे पुष्कळ आढळतात. त्यातल्या त्यात राजकारणी स्वार्थ हा असा एक बेदरकार ज्वालामुखी आहे की तो केव्हा कोठे कसा आपले तोड उघडून आग ओकू लागेल आणि कोणत्या पांढऱ्या गोष्टीवर तांबडा रंग चढवून त्याची न्यायोक्त राखरांगोळी करील, ह्याचा काहीच नेम सांगता येत नाही. तात्पर्य, माणसांची न्यायबुद्धी कसल्या ना कसल्या स्वार्थाच्या गजकर्णाने चिडचिडलेली असल्यामुळे, मानवी न्यायमंदिरातील न्याय हा शुद्ध न्याय नसून, न्यायाचा केवळ नाटकी फार्सच होय.
परमेश्वरी न्याय अन्यायाचे कोडे
मानवी न्याय नाटकी म्हणजे पाचकळ तर खराच, पण देवाच्या घरी तरी न्याय आहे काय? मानवांच्या घरी न्याय नाही, आणि देवाच्याही घरी न्याय नाही, तर हा विश्वाचा कारभार काय अन्यायावरच बिनधोक चाललेला आहे? मानवी राज्यांत अन्यायाची परमावधी झाली तर बोलबोलता राज्यक्रांती होऊन, मोठमोठी साम्राज्ये रसातळाला गेल्याची साक्ष इतिहासात मुबलक आढळते. विश्वाचा पारमेश्वरी किंवा निसर्ग कारभार जर अन्यायाने किंचित कोठे डागळता, तर या अनंत सृष्टीचा एक क्षणात एळकोट उडाला नसता काय? पृथ्वीच्या पाठीवर शेकडो क्रांत्यांची उलथापालथ दररोज घडत असताही, पृथ्वीचा भ्रमणक्रम, चंद्र सूर्याचे उदयास्त, ऋतुंची येणीजाणी, इत्यादी ठराविक कार्यक्रमाच्या कदरीत अणुमात्र कधी कोठे अदलबदल नाही, तर देवाच्या घरी न्याय नाही, असे कसे म्हणता येईल?
या अनंत विश्वाचा नियंत्रणकर्ता गव्हर्नर कोणीही असो, तो दिसो वा न दिसो, निर्गुण असो वा सगुण असो, त्याच्या विश्वनियंत्रणात न्याय अन्यायाच्या खटकेबाज कदरीची काही शक्ती सदैव जागृत नसती, तर विश्वाचा कारभार एक क्षणमात्रसुद्धा चालता ना? अंतराळात विखुरलेल्या अनंत विश्वाची घटना व कारभार जर शिस्तपार कदरीने चाललेला आहे, तर परमेश्वराच्या दरबारात न्याय नाही असे कसे म्हणता येईल?
या अनंत विश्वाचा नियंत्रकर्ता गव्हर्नर कोणीही असो वा निलिंगी असो, ते एखादे तत्त्व असो वा सत्त्व असो, त्याच्या विश्वनियंत्रणात न्याय अन्यायाच्या खटकेबाज कदरीची काही शक्ती सदैव जागृत नसती, तर विश्वाचा कारभार एक क्षणमात्र चालता ना! अंतराळात विखुरलेल्या अनंत विश्वाची घटना व कारभार जर शिस्तपार कदरीने चाललेला आहे, परमेश्वराच्या दरबारात न्याय नाही असे कसे म्हणावे? पण
`देवाच्या घरी न्याय नाही`
असे उद्गार आपण शेकडो लोकांच्या तोडून ऐकतो आणि परिस्थितीची दरवर पाहणी करून त्या उद्गारांना पाठिंबा देतो. एखाद्या निःसंशय सज्जन गृहस्थावर आपत्तीचा कडेलोट झाला, एखाद्या परोपकारी माऊलीवर दैवाग्नीचा ज्वालामुखी बेफाम आग पाखडू लागला, किंवा एखाद्या निरिच्छ स्वार्थत्यागी जनसेवकाच्या कार्यात संकटांच्या काट्यांच्या पायघड्या पडल्या, तर आपण बेछूट असा निर्णय देतो की, `देवाच्या घरी न्याय नाही.` सतीच्या घरी बत्ती भडकते कां, आणि वेश्येच्या दारी हत्ती झुलतो का? पुष्कळ सज्जन दुःखांनी होरपळत असतात, तर हजारो दुष्टकर्मे दारिद्र्याची निरास, तर जळवांप्रमाणे लोकांचे रक्त पिऊन तुंद बनलेल्या झब्बूंच्या घरी सर्व ऐश्वर्याची आरास!
रंजल्या गांजल्या अस्पृश्यांना आपणहून पोटाशी धरणाऱ्या व त्यांच्या साक्षरतेसाठी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्रे ठेवणाऱ्याच्या पायात फाटका जोडा नसावा आणि लोकांना सर्रास बेवडा पाजून त्याच्या घाणीवर झब्बुगिरी मिरविणाऱ्या घाणबहाद्दराच्या ढुंगाखाली चोवीस तास पळती मोटार चिकटून राहावी, या विषमतेचे कारण काय? गोरक्षकाच्या गळ्यात भिकेची झोळी आणि कसायाला दरघडी तूप पोळी! लोकांचे गळे कापण्याचा धडधडीत धंदा करणाऱ्याच्या गळ्यात पाचूची कंठी आणि अभेद भावाने परोपकार करणाऱ्याच्या टाळक्यात दुर्दैवाची खुंटी, इत्यादी प्रकार पाहिले म्हणजे `देवाच्या घरी न्याय नाही` असे उद्गार उद्वेगाने बाहेर पडतात. इतकेच नव्हे तर अधमाधम राक्षसी कृत्ये करणारांच्या पापावर पांघरूण घालण्यासाठीच श्रीमंतीच्या छिनाल लक्ष्मीला देवाने या जगात वेश्येप्रमाणे मोकाट सोडली आहे की काय, असा आपल्याला दाट संशय येऊ लागतो, आणि हा विश्वाचा कारभार देवाने समतेपेक्षा विषमतेवरच चालविला आहे, ही कल्पना काँक्रीट सिमेटाच्या दगडाप्रमाणे वज्रलेप घट्ट बनते.
आम्हा मानवांच्या जन्माबरोबरच आमच्या पिंडाला चिकटून जन्मलेल्या स्वार्थबुद्धीच्या दूर्बिणीतूनच न्याय अन्यायाची चिकित्सा करण्याची आमची प्रवृत्ती असल्यामुळे देवाच्या घरी आम्हाला न्याय दिसत नाही. आमच्या सुखला, म्हणजे सुखाविषयी आमच्या ठराविक कल्पनेला, जरा किचित कोठे टाचणीचे टोक लागले की आमच्या असंतोषाचा वणवा आतल्या आत धुमसू लागतो. त्यातूनही जेव्हा तुफाने, वावटळी, धरणीकंपन, ज्वालामुखी, महापूर, अग्निप्रलय इत्यादिकांच्या रणधुमाळीत आमच्या सर्वस्वाची चांदी आटते; किंवा महामारी प्लेगसारख्या सर्वभक्षक रोगांच्या साथीत लक्षावधी मानवांचा बोल बोलता संहार होतो, तेव्हा तर विश्वंभर परमेश्वरावर जुलमांचे आणि अत्याचारांचे हवे तितके आरोप करताना आमची मनोवृत्ती लवमात्र मुरडत नाही. मनावरच स्वार्थाचे जाडजूड पूट वाजलेले असल्यामुळे, निसर्गाच्या समतोल संरक्षणासाठी उपरोक्त नानाविध क्रांत्यांच्या दणक्यांचा वरवंटा यथाक्रम यथाकाल फिरवणे, ईश्वरी न्यायाला किती अगत्याचे आणि क्रमप्राप्त असते, ह्याची थोडीशीही कल्पना आमच्या विचारयंत्रात विवेकाचे वंगण घालीत नाही. अर्थात् सज्जनांचा छळ का होतो, आणि दुर्जनांवर छिनाल लक्ष्मीच्या वैभवाची मुसळधार खैरात का होते, इतका सोपा प्रश्न सोडवायलाही आमच्या बुद्धीची लायकी नालायक बनली, तर त्यात आश्चर्याला किंवा अचंब्याला जागाच कोठे आहे?
प्रत्येक मनुष्याचे, एवढेच नव्हे तर प्रत्येक प्राणीमात्राचे वर्तमान जीवन म्हणजे त्याच्या पूर्वजन्मार्जित बऱ्यावाईट कर्माचा आणि संस्कारांचा परिपाक होय. मागील जन्मी ज्या बऱ्यावाईट कर्माचे विरजण घातले असले, त्या प्रमाणात या जन्मी त्याला बऱ्यावाईट संचितांचे दही लाभते. हे दही किती गोड, किती आंबट, किंवा किती पाणचट आहे, एवढेच प्रत्येक मनुष्याच्या जन्मकुंडलीवरून अजमावत येते. यापेक्षा अधिक काही नाही. कुंडली म्हणजे मागील जन्माच्या संचितांचा नकाशा. संचित भोक्तृत्व आणि क्रियमाण या तिरंगी गोफांत मनुष्याच्या जीवनाचा ओघ जन्मानुजन्म गुंफला जातो. जसे पूर्वीचे संचित असेल, तसे या जन्मी भोक्तृत्व भोगल्याशिवाय सुटकाच नसते. चालू जन्माच्या क्रियमाणाची फळे पुढील जन्मी भोगावयाची असतात. त्यांच्या जमाखर्चाचा गोंधळ चालू भोक्तृत्वात मुळीच नसतो. शिवाय, निसर्गाच्या चित्रगुप्ताच्या कचेरीत सत्कर्माच्या आणि दुष्कर्माच्या नोंदवह्या अगदी निरनिराळ्या आणि स्वतंत्र असल्यामुळे,
सत्कर्मातून दुष्कर्माची वजावट
करण्याची सावकारी ‘मेहरबानी` निसर्गाला माहीत नाही. बऱ्यावाईट संचित कर्माप्रमाणे बरीवाईट भोक्तृत्वाची फळे निरनिराळी भोगल्याशिवाय निसर्गाच्या दण्डकातून कोणीही निसटू शकत नाही. पुष्कळ वेळा सज्जनांवर आपत्तीचे पर्व कोसळतात याचे कारण त्यांचे पूर्वजन्मार्जित दुष्कृत्यांचे अथवा कुसंस्कारांचे भोक्तृत्वाचे परिणाम, किंवा त्या व्यक्तींच्या विशेष सद्गुणांचा उत्तम परिपाक होण्यासाठी त्याची निरनिराळ्या संकटांच्या भट्टीत होणारी सत्वपरीक्षा. ते सर असले, सत्पुरुष असले, परोपकारी असले, तर त्यांच्या या सर्व सत्कर्माची साठवणी ऊर्फ संचित ते पुढील जन्मा मधुर फळांच्या रूपाने उपभोगतील. परंत ते या जन्मी सज्जन आहेत, या सबबीवर त्यांच्या मागील जन्मीच्या संचितांचे चालू भोक्तृत्व त्यांना टाळता यावयाचे नाही. चालू जन्माच्या भोक्तृत्वावरून आपल्याला आपल्या पूर्वजन्मीच्या संचिताच्या बऱ्यावाईट स्वरूपाची स्पष्ट कल्पना झाली पाहिजे, होणे अगत्याचे आहे, आणि ही कल्पना नीट झाली म्हणजे त्याप्रमाणे आयुष्यात आपल्या क्रियमाणाची पावले नीट जपून कशी टाकावी, पुढील जन्मासाठी सत्कर्माच्या संचितांचे भांडवल मुबलक कसे जमवून ठेवावे, हाथ सर्व आपत्तीचा खरा मूळ उद्देश असतो.
आपले पूर्वसंचिताचे दही जर आंबटढाण बनलेले असेल, तर त्यात थोडी चतुराईची साखर टाकून ते गोड करून खाणे, ह्यालाच पुरुषार्थ असे नाव आहे. क्रिया घडली की प्रतिक्रियेचा प्रत्याघात व्हायचाच. तो निसर्गालाही टाळता येत नाही, तर निसर्ग तरी आम्हा मानव प्राण्यांना तो टाळण्याची सवलत किंवा मदत काय म्हणून देईल? परंतु मनुष्यप्राण्याला बुद्धीची विशेष देणगी प्राप्त झालेली असल्यामुळे, आघाताचा प्रत्याघात त्याला सर्वस्वी जरी टाळता आला नाही, तरी त्या विषयी आगाऊ अंदाज बांधून त्याच्या दणक्याला पुष्कळ प्रमाणात सौम्य करण्याइतकी बुद्धीची कुशलता माणसात निसर्गाने खास ठेवलेली आहे. विस्तवाच्या निखाऱ्याला हात लावला तर हात भाजून बोटाला टरटरून फोड येतात. हा निसर्गाचा नियमच आहे. राजा असो वा रंक असो, कोणाचाही त्यापुढे मुलाहिजा चालणार नाही, किंवा कोणालाही विस्तव क्षमा करणार नाही.
अशाही स्थितीत किंचितपट करून एखादा रखरखीत निखारा चटकन हातानेच उचलून गुडगुडीच्या किंवा चिलमीच्या `टकुऱ्या`वर ठेवणारे लोक असतातच ना? ही जी झटपट चपळाई, तिलाच बुद्धिकौशल्य असे म्हणतात. स्पर्शाच्या परिणामाची जाणीव ठेवून तो परिणाम शक्य तितक्या सौम्य करण्यासाठी मनुष्य या ठिकाणी ज बुद्धीची कुशलता दाखवितो, तीच कुशलता आकाशस्थ ग्रहांचे आपत्तीकारक परिणाम सौम्य करण्याच्या कामी खात्रीने उपयोगात आणू शकतो. जन्मकुंडलीवरून आपत्कारक ग्रहांच्या परिणामाची रूपरेषा ज्योतिषी सामान्यतः सांगू शकतात. त्या परिणामाच्या पूर्ण तडाक्यांचा आगाऊ अंदाज बांधून, आपण जर आपल्या आचारविचारादि जीवनक्रमांत योग्य तो बदल चाणाक्षपणाने केला, तर ग्रहदशेचे आपत्कारी फटके (टळले नाही तरी) जोरीने बसण्याऐवजी बऱ्याच सौम्यपणात बसतील, यात मुळीच संशय नाही. परंतु, ग्रहदशांच्या परिणामांना सबझूट मानणारांची किंवा त्या परिणामांची नेभळेपणाने हैबत खाणारांची मात्र, त्या फटक्यांच्या कडकडीत दणक्यातून सुटका होणे केव्हाही शक्य नाही. विस्तवाची दाहकता सबझूट मानली काय, किंवा त्याची रात्रंदिवस धास्ती घेतली काय, निखारा उचलण्याचा प्रसंग आला की दोघांचेही हात लटपटून, बुद्धिकौशल्याच्या अभावी, ते खरपूस पोळल्याशिवाय राहणार नाहीत.
पूर्वजन्मार्जित बऱ्यावाईट संचितांची बरीवाईट फळे यथातथ्य भोगायला लावण्याची कामगिरी परमेश्वराने आकाशस्थ ग्रहांकडे सोपविलेली आहे. आणि ती त्यांच्याकडून परस्पराकर्षणाच्या अखंड तत्त्वाने आपोआप बजावली जाते. सर्व सृष्टी अवघ्या पंचमहाभूतांच्या पाच तत्त्वांची गोळाबेरीज आहे. मानवदेह सुद्धा पंचतत्त्वात्मकच आहे. प्रत्येक ग्रहाच्या दशेत एकेक तत्त्व विशेष प्रान असल्यामुळे, आमच्या कायिक, वाचिक, मानसिक कसल्याही बऱ्यावाईट कर्माची शुभ अशुभ फळे देण्याच्या कामी ते ते तत्त्व हुकमी परिणामकारक होत असते. चांगल्या संचिताचा परिणाम चांगला आणि वाईटाचा वाईट असा भोगल्याशिवाय कोणत्याही जिवाची अथवा प्राण्याची सुटकाच कधी व्हायची नाही, असा ज्या सृष्टीचा निसर्गदण्डक अखंड जागरूक आहे, त्या सृष्टीचालकावर अन्यायाचा आरोप करणे चुकीचे आहे. आमच्या डोळ्यावर चिकटून बसलेला स्वार्थाचा चष्मा बाजूला काढून ठेवल्याशिवाय, लौकिकी व्यवहारात दिसणाऱ्या
विषमतेतच निष्कलंक समता
कशी आहे आणि अन्यायातच खरा न्याय कसा दडून बसला आहे, ह्याची आम्हाला प्रचीती पटणार नाही. राक्षसकर्म्या नराधमांवर ऐश्वर्याची श्रावण झोड का? आणि नपुसंकाच्या गळ्यात पद्मिनीप्रमाणे, महामूर्ख पंढावर लक्ष्मीची फिदा मर्जी का? या `का`ची चिकित्सासुद्धा आपण नेहमी स्वार्थी भावनेनेच करीत असतो. जसे ज्याचे संचित, तसे त्याचे भोक्तृत्व! शिवाय, केवळ लक्ष्मीची बहाल मर्जी एखाद्यावर झाली, म्हणजे तो प्राणी पूर्वजन्मी मोठा पुण्यकर्माचा असतो, असे थोडेच आहे? श्रीमंती ऐश्वर्य आणि गजान्तलक्ष्मीची पायचाटी म्हणजे उत्तम श्रेष्ठ संचितांचे पारितोषिक तरी कशावरून समजायचे?
या अवस्थेतच अनेक जिवांच्या दुष्कर्माची कडेलोट व्हावयाची असते. योगभ्रष्ट जीवच तेवढे राजाच्या जन्माला जातात असे जे म्हणतात, त्या उक्तीतच या शंकेचे समाधान सापडते. सुखद:खाच्या कल्पना आमच्या आम्हीच बनवीत असतो. अर्थात् ज्याला आम्ही सुख समजतो, तेच अंती दु:ख आहे, आणि ज्याला आम्ही दुःख मानून खेदाने कण्हतो कुंथतो, त्याच्या पोटातच सुखाचा कोंब आहे, हे आम्हाला पटायलाच फार कठीण जाते. म्हणूनच शनि, राहू, मंगळादि ग्रहांच्या दशांच्या परिणामांनी आम्ही हतबल व हतबुद्ध होऊन देवाच्या सबबीवर देवाच्या न्यायाला दोष देतो.
****
प्रकरण १० वे
साडेसातीची आवश्यकता
विश्वविधात्या परमेश्वराने हा कल्पनातीत अनंत पसारा प्रथम का व कसा निर्माण केला, केला का आपोआप झाला, केव्हा केला, कधी झाला, या प्रश्नांची उत्तरे देण्याचा खटाटोप आजपर्यंत अनेक शास्त्रज्ञांनी केलेला आहे. पण त्यामुळे खुद्द संशोधकांचेही समाधान झाल्याचे दिसत नाही. संशोधनाच्या दृष्टीने या प्रश्नांना कितीही महत्त्व असले, तरी हे सारे विश्व अनादि व अनंत आहे असे गृहीत धरून, या विश्वरचनेच्या कार्यक्रमात आम्हा मानवांची भूमिका कोणती आणि कर्तव्य काय, याचा विचार केला पाहिजे.
परमेश्वराने या विश्वाची रचना केली ती कशासाठी? ही पृथ्वी निर्माण केली ती कशासाठी? अनंत कोटी जीवजंतू, पशुपक्षी यांच्या बरोबरच अचाट कल्पनाशक्तीची देणगी दिलेला मनुष्यप्राणी त्याने निर्माण केला, तो कशासाठी? काही विद्वान म्हणतात की परमेश्वराने विश्वरचना केली आणि त्यात चाललेले खेळ पहात तो स्वस्थ बसला आहे म्हणजे त्याने काही तरी एक बाजार भरविला आणि आपण मात्र त्यापासून वेगळा झाला; आता तो बाजार जाणे न त्यातले बाजारी जाणे, हवा तो बरा वाईट गोंधळ घाला, मला काय त्याचे? असा या विधानाचा अर्थ होतो. परमेश्वरावर इतक्या बेजबाबदारीचा आरोप करताना, या ताळेबंद विश्वरचनेत बिनचूक जबाबदारीने वावरणारा निसर्गधर्म आपल्याला कसा दृष्टीआड करता येईल?
अंतराळात अधांतरी विखुरलेल्या नक्षत्रांपासून तो थेट आपल्या पृथ्वीपर्यंत सर्व ग्रहांची दिनचर्या काटेकोर ताळेबंद चाललेली प्रत्यक्ष दिसत असताही, विश्वाच्या पसाऱ्याला खेळ लीला किंवा करमणूक असल्या सदरात टाकू पहाणे, हा केवळ बुद्धिभ्रंश होय. दिवस रात्र, सूर्योदय-चंद्रोदय व त्यांचे अस्त, समुद्राची भरती-ओहोटी, चंद्रसूर्याची ग्रहणे, धूमकेतूंचे उदयास्त, ऋतुमानांचे ठराविक येणे-जाणे, चंद्राची क्षयवृद्धी, इत्यादी अनंत गोष्टी, घड्याळातील कदरबाज यंत्ररचनेप्रमाणे, जर दररोज आम्ही उघड्या डोळ्यी पहातो, आणि केवळ आकडेमोडी साध्या गणिताने सांगतो, तर ही विश्वरचना आणि तिचा जीवनक्रम ही नुसती लीला किंवा काहीतरी करमणुकीचा बेजबाबदार खेळ, असे कसे म्हणता येईल?
तिथीची पाऊणपट केली की तितक्या वाजता समुद्राच्या भरतीचा सीमाकाल बिनचूक अजमावून दररोज पहाता येतो, तर भरती ओहोटी म्हणजे सात अष्टमांश पृथ्वी व्यापणाऱ्या महासागराची उच्छृंखल लीलाच मानायची काय? भरती ओहोटीचे आकर्षण मुख्यतः चंद्राशी आहे. त्यातही कधी क्षणाची चुकभूल घडत नाही. असले उघड्या डोळ्यांना दिसणारे पुरावे पाहूनही, विश्वरचनेला लीला किंवा खेळ समजणे, कवीच्या काव्याला शोभले तरी, विवेकवादाला पटत नाही.
अंतराळात विखुरलेल्या शनि, मंगळ, बुध, गुरु इत्यादी ताज्याप्रमाणे आपली पृथ्वी ही सुद्धा अंतराळात पद्धतशीर भ्रमण करणारी एक तारका आहे. एक ग्रह आहे. मनुष्यापासून तो किडामुंगीपर्यंत जसे या पृथ्वीवर जीव आहेत, तसे ते या शनि, मंगळ, बुध, गुरुवर आहे की काय, असल्यास ते कसे असावे, त्यांच्याशी आपल्याला काही बातचीत करता येईल की नाही, इत्यादि अनेक प्रश्न युरोपस्थ खगोल शास्त्रज्ञांनी हाती घेतले असून, त्यात त्यांनी अनेक अनुमाने काढली आहेत. मंगळ ताऱ्यावर वस्ती आहे, हा सिद्धांत बहुतेक सिद्ध झाल्यासारखा असून, नुकताच मंगळ तारा पृथ्वीच्या बराच जवळ आल्याची पर्वणी साधून, युरोपस्थ खगोल शास्त्रज्ञांनी आल्पस पर्वताच्या माथ्यावर प्रचंड प्रकाशाचा झोत तयार करून, मंगळावरील लोकांना `सिग्नल` खुणा करण्याचा प्रयत्न केला. अजूनही हे असले प्रयत्न चालूच आहेत आणि निसर्गदत्त कल्पनाशक्तीच्या जोरावर मनुष्य प्राणी या विश्वरचनेचे एकनिष्ठ संशोधन करण्यात काय काय चमत्कारांचा आदिअंत हुडकून काढील, हे सांगण्याचा अधिकार फक्त भविष्यकाळ आहे.
मूठभर मीठ आणि पोटभर भाकरीला महाग झालेल्या आजच्या हिंदुस्थानाला स्वतःच्या पोटाच्या विश्वापलीकडे पहाण्याची शक्ती जरी नसली, तरी विश्वाच्या पोटांतील चमत्कार हुडकण्यासाठी युरोप, अमेरिकेसारख्या समृद्ध देशांतील खगोलज्ज लोक रात्रंदिवस परिश्रम करीत आहेत. केवळ अंतरिक्षांतील चमत्कार नव्हे, तर या सृष्टीच्या निसर्गधर्मातील गूढ रहस्यांनासुद्धा हुडकून काढून त्यांचा मानवी सुखवर्धनासाठी उपयोग करण्यात संशोधन विद्वानांच्या पिढ्यान् पिढ्या खर्ची पडल्या आहेत, आणि सध्या पडत आहेत. हिंदुस्थानात प्रोफेसर सर जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतीच्या जीवन-संवेदनाविषयी लावलेले शोध, आणि युरोपात बिनतारी तारायंत्रने केलेली अचाट क्रांती, इत्यादी परिणाम नीट विचारात घेतले तर बुद्धिमान मानवांच्या या सर्व धडपडी कशासाठी चालल्या आहेत?
हा प्रश्न प्रामुख्याने आपल्यापुढे येतो. लक्षावधी मैल अंतरावर असणाऱ्या अंतराळातील सूर्य, चंद्र, शनि, मंगळाचे खास फोटो काढून, त्यांवर काय काय भानगडी चालल्या असाव्या, त्या कोण करीत असाव्या, इत्यादी धाडशी प्रयोगापासून तो केवळ वातावरणाच्या लहरींतून पातळवासी अमेरिकन मित्राशी बिनतारी टेलिफोनचे खास संभाषण करण्यापर्यंत माणसांनी निसर्गावर जी हातखंडा मोहीम चालविली ओह, तिची अखेर तरी कशात होणार? बॉम्ब हावित्झर टॉरपेडो ड्रेडनॉट विमान वगैरे मानवसंहाराच्या साधनांचीही मुबलक पैदास करण्यात माणसांचा आटारेटा रात्रंदिवस चालूच आहे. घरबसल्या चुटकी वाजविताच अनेक अक्षौहिणी सेना ठिकठिकाणी गारद करणारे मंत्र तंत्र वा यंत्र शोधून काढण्यातही अनेक खंदे संशोधक आपली बुद्धी आणि आयुष्य खर्ची घालीत आहेत. ह्या सर्व संशोधक महाभागांना विचारले की, `ही सारी खटपट आणि धडपड तुम्ही कशासाठी चालविली आहे?` तर ते झटकन उत्तर देतात की,
"जगात शांति प्रस्थापित करण्यासाठी"
तलवार चालवून मानवी रक्तपाताच्या पुण्याईवर परदेशांना गुमागिरीत जखडून टाकणारे शहाणेसुद्धा आपल्या अत्याचारांचे मण्डण शांतीच्या सबबीनेच करतात. महायुद्ध कशासाठी? तर रक्तपात थांबविण्यासाठी. काट्याने काटा काढता आला, तरी त्याने जखमा बऱ्या होत नसतात! म्हणजे विषप्रयोग करून विष उतरणारे देवदूतच हे म्हणायचे! रक्तपात, अत्याचार, मुस्कटदाबी इत्यादी साधनांनी परदेशांवर राज्य करणाऱ्या उपटसुंभ राज्यकर्त्यांनी "आम्ही हे सर्व शान्तिसाठी करीत आहोत" असल्या वल्गना करणे, म्हणजे घराला लागलेली आग पेट्रोलचे डबे ओतून विझविण्याचा प्रयत्न करण्याइतकेच बाष्कळपणाचे आहे. आज हिंदुस्थानात ब्रिटिश नौकरशाहीची जी सोटेबारगिरी चालू आहे, तीसुद्धा ते म्हणतात. `पीस अण्ड ऑर्डर` साठीच.
पीस उर्फ शांति म्हणजे काय?
त्याची ती `पीस` ऊर्फ शांति ही चीज तरी काय असावी? शांतीची शांतता थंडीच्या कडाक्याप्रमाणे सर्वत्र फैलावली, म्हणजे काय होणार? काय रामेश्वर उठून काश्मिरला जाणार, सगळे भिकारी टाटा बनणार, हिंदु लोक गोरे बनणार, साहेब लोक काळे आदमी बनणार, दारूचे अमृत होणार, पाण्याऐवजी दुधाचा पाऊस पडणार, टाकसाळीत मुक्तद्वार द्रव्य लुटले जाणार, बायांचे बुवा होणार? होणार तरी काय? शांति म्हणजे कायमची निवांती. मग कसली खटखट नाही, घडघड नाही, काही नाही. शांति मिळाली की मग जन्म तरी कसला आणि मृत्यू तरी कसला? शांतीचे स्थान म्हणजे मसणवटी तेथे मात्र `पीस` आणि `ऑर्डर` नांदते खरी, `हिंदुस्थानात पीस आणि ऑर्डर प्रस्थापित करावयाची आहे` या महावाक्याचा स्पष्टार्थ
`हिंदुस्थानाची मसणवटी बनावयाची आहे`
असाच होतो. माणूस मेला म्हणजे त्याला शांति मिळते. फलाण्याच्या `आत्म्याला शांति मिळो!` ही प्रार्थना कोणीही जिता माणूस कोणाच्या जिवंतपणी करती नाही. जिवंतपणा हा शांतीसाठी मुळी नाहीच. अर्थात शांतीसाठी धडपडणारी, तडफडणारी राष्ट्रे आपल्या जीवाला कंटाळलेली आणि मृत्यूसाठी चवताळलेली असली पाहिजेत एक, अथवा लबाड बोलून भोळ्या भाबडयांना फसविणारे सोनेरी टोळी असली पाहिजेत, या पेक्षा तिसरा कयासच संभवत नाही. चिरकालिक शांतीच मिळवायची ते जे काम सोमलाच्या एका पुडीने किंवा तळ्याविहिरीतल्या एका बुडीनेही सफाईत साधते त्यासाठी चमत्कार शोधनाचा आटारेटा कशाला, जिनीवाची लीग ऑफ नेशन्स कशाला, हिंदुस्थानात रॉयल कमिशने कशाला आणि विनचौकशी कैदेचे कायदे तरी कशाला? मध्यवर्ती दिल्लीच्या बुरुजावरून चौफेर हजार मेली हॉवित्झरचा मुल्खमैदानी मारा केला की चोवीस तासात अखिल भरतखंडात शांतीच शांत शांतिसूक्ते म्हणायला सुद्धा कोणी जिता जीव सापडणार नाही! अशा शांत अवस्थेत शांतिसम्राट म्हणून दिल्लीच्या तक्तावर बसायला कोणाचे प्रेत तयार होईल, हे तरी कोणाच्या शांत थंडगार घेताने जाहीर करावे? आसेतु हिमाचल पीसच पीस आणि ऑर्डरच ऑर्डर!
शान्ति का क्रान्ति?
विधात्याने हे अनंत विश्व आणि ही नाना रत्नांची वसुंधरा निर्माण केली, ती जर केवळ शांतीसाठीच असती, तर पृथ्वीला आणि अंतराळातल्या अगणित ग्रह ताऱ्यांना नियमित गतियुक्त करून त्यांना सूर्याभोवती वणवण भटकायला त्याने लावलेच असते कशाला? चंद्राची क्षयवृद्धी कशाला आणि समुद्राची भरती ओहोटी तर कशाला? तुफाने कशाला? धरणीकंप कशाला? आणि जन्ममृत्यू तरी कशाला? माणसांप्रमाणे जर विश्वविधाता शांतीचा भोक्ता असता, शांति देव त्याच्या विश्वनिर्मितीचे ध्येय असते, तर त्याने या विसाचा कायमचा एक जड ठोकळा रचून ठेवला असता की काम भागले असते! मग काय शांतीच शांति! ना कोठे धडपड का ना कोठे काही गडबड. सर्व शांत निवांत! म्युझियममध्ये सृष्टीचे शेकडो देखावे हुबेहूब करून मांडलेले असतात. तसला प्रकार दिसला असता.
म्युझियम मधला ज्वालामुखीचा देखावा साक्षात अग्निप्रळयाचा दिसतो. पण तो काही म्युझियमची इमारत जाळून खाक करीत नाही. केव्हाही पाहिले तरी तोच धुराचा लोट, तोच अग्नीचा वर्षाव! प्रत्यक्ष त्याला हात लावला तरी हात भाजत नाही, जळत नाही. मातीचे ढेकूळ! थंडगार. अगदी शांत. तेथील प्रदर्शनात मोठमोठे सिंह, वाघ, सर्प ठेवलेले असतात. ते सुद्धा अगदी हुबेहूब जित्याप्रमाणे दिसतात. आता आपल्यावर झडप घालतील की काय असा भास होतो. पण जित्यांचा जिवंतपणा त्यात नसतो. ते थंडगार, शांत असतात. कारण ते मेलेले मुर्दे असतात. विश्वविधात्याने या अनंत सृष्टीच्या सनातन चालनेसाठी प्रत्येक अणुरेणूत जी एक वर्णनातीत प्राणज्योत उजळून ठेविली आहे, ती या मुर्धांत विझालेली असते. ती विझाली, किंवा विझविली, तेव्हा ते सिंह, वाघ शांत झाले. त्यांचे मुर्दे पडले. ते मेले. त्यांना `पीस` मिळाली आणि मग त्यांच्या मुर्धांना ही प्रदर्शनातील `ऑर्डर` म्हणजे सुव्यवस्था लाभली.
शांति मुर्द्याची, क्रांति मर्दाची
जित्या मर्दाने क्रांति करावी. मेल्या मुर्द्याने शांति करावी. क्रांति माणसाची, शांति मसणाची. हा निसर्गाचा सनातन धर्म आहे. विश्वरचनेचे ध्येय आहे. विश्वातली अगम्य प्राणज्योत क्रांतीसाठी धडपडत असते, शांतीसाठी नव्हे.
परमेश्वराने विश्वरचनेची जी एवढी यातायात केली आणि या पृथ्वीला नानारत्नांची खाण बनविली, ती काय मेल्या मुर्द्याची मसणवटी म्हणून? मुळीच नाही. अखंड प्रकाशमान सूर्याला मध्यवर्ति केंद्र बनवून, त्याच्या भोवती चंद्र मंगळादि ग्रहांना पद्धतशीर चक्राकार फिरत ठेवले आहे, तेव्हा त्या परस्परांमध्ये काही तरी आकर्षणाचा विशेष धर्म असलाच पाहिजे. आणि ज्या अर्थी सारे विश्वच क्रांतीसाठी निर्माण झालेले आहे, त्या अर्थी या सर्व ग्रहांमध्ये क्रांतिकारक काही तरी विशेष धर्माची योजना झालेली असलीच पाहिजे. त्याशिवाय क्षुद्र कीटकांपासून तो थेट मनुष्यापर्यंत आणि धुळीच्या क्षुल्लक कणापासून तो हिमालयाच्या गौरीशंकरापर्यंत क्रांति एनरजीचा सणसणाट आपोआप चाललेला राहताच ना. क्रांतिचे चैतन्य मानवी जीवनविकासाला पुरविण्याचे काम नवग्रहांकडून कसकसे बजावले जाते, ते आता पाहू-
१) आपली जीवन-संवेदना म्हणजे जगण्याची इच्छा ही गर्भसंभवापासूनच आपल्या उमलत असते. फुलाप्रमाणे तिचा विकास होत असतो. ह्या विकासाच्या कामी रवि सूर्य यांचे गुणधर्म सहाय्य करत असतात. सूर्य ज्या प्रमाणे आपल्या स्वयंभू तेजाचा विकास करीत असतो, तीच विकासनाची क्रिया जीव आपल्या अनुकरणात आणतो. म्हणजे रवि हा जीवन-विकासाचा ग्रह होय.
स्पष्टीकरण
प्रकाश म्हणजेच जीवन. प्रकाश नष्ट झाला की साऱ्या विश्वाने राम म्हटलाच. अखिल विश्वाचे जीवन सूर्यप्रकाशावर बिनधोक चालले आहे. प्रकाशासाठी सारी सृष्टी धडपडत असते. सूर्यास्त झाल्यावर अंधाराला पायबंद लावण्यासाठी आपण दिवे लावतो. शुक्लपक्षात परप्रकाशी चंद्राचे चांदणे १५ रात्री लाभते. तरीसुद्धा गॅसलाईट इलेक्ट्रिसिटीचा प्रकाश निर्माण करून, आपण आपली स्वयंभू प्रकाश वांछना पुरविण्याच्या धडपडी अखंड चालविल्याच आहेत. रात्र छोटी असो वा मोठी असो, चांदणी असो वा काळोखी असो, आम्हाला लवमात्र अंचार सहन होत नाही. अंधार म्हटला की आमचा जीव कोदाटतो, प्रकाशासाठी धडपडतो; मग तो प्रकाश मेणबत्तीचा असो, नाहीतर पणतीचा असो, पण आम्हाला प्रकाश पाहिजे.
या कारणे सूर्यापुढे । दुसरी साम्यता न घडे ।।
जयाच्या प्रकाशें उजडे । प्राणीमात्रांसी ।।३।।
सूर्याचे अधिष्ठान डोळे । डोळे नसता सर्व आंधळे ।
या कारणे काहीच न चले । सूर्येविण ।।८।।
म्हणाल अंध कवित्वें करिती । तरी हेहि सूर्याचीच गति ।।
थंड झालिया आपुली मति । मग मतिप्रकाश कैचा ।।९।।
उष्ण प्रकाश तो सूर्याचा । शीत प्रकाश तो चंद्राचा ।
उष्णत्व नसता देह्याचा । घात होये ।।१०।।
या कारण सूर्वेंविण । सहसा न चले कारण ।
श्रोते तुम्ही विचक्षण । शोधून पाहा ।।११।।
- दासबोध दशक १६-२ स.
सहा महिने रात्र जाणि सहा महिने दिवस असलेल्या उत्तर ध्रुवाच्या बर्फमय प्रदेशातील प्राचीन आर्यजनांनी अग्निपूजनाचा उपक्रम कां सुरू केला, त्याचे मर्म वाचकांच्या आता लक्ष्यात आले असेलच. तेच अग्निउपासक आर्यजन उत्तर ध्रुवाकडून मध्य आशियातील गोबीच्या अरण्यात पंजाबच्या सरहद्दीवर येताच, त्यांना स्वच्छ नीळवर्ण निरभ्र आकाशात सूर्यबिंबांचे दर्शन होताच त्यांचा हर्ष गगनात मावे ना.
सूर्यापुढे आणिक दुसरें । कोण आणावें सामोरे । ते
जोरासी निर्धारे । उपमेरहित ।।१८-१६।२.
जीवन प्रकाशासाठी अग्निपूजन करणाऱ्या प्रकाश मुमुक्षू आर्यांना सूर्यदर्शन होताच, त्यांचा मतिप्रकाश विकसित झाला आणि त्यातच हिंदूना पूज्य व पवित्र वाटणाऱ्या चतुर्वेदांची न भूतो न भविष्यति अशी निष्पत्ति झाली. मतिप्रकाशजन्य कवित्वाच्या उत्कट उमाळ्यातून
ओम् भूर्भुवः स्वः
ओम् तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात्
हा जो सवितृ प्रार्थनेचा गायत्री मंत्र निर्माण झाला, तो आजही अनेक सूर्योपासकांच्या जीवन-संवेदनेला अंत:प्रकाशाने अखंड उज्ज्वल ठेवीत आहे. तात्पर्य, रविग्रह म्हणजे यच्चावत जीवसृष्टीचा जीवन प्रकाशच होय. सूर्योपासना आणि अग्निपूजन केल्यामुळे मनुष्याची कायिक, वाचिक, मानसिक आणि आत्मिक शक्ति सूर्याप्रमाणेच तेजस्वी आणि वीर्यवान बनते. क्षयरोगासारखे असाध्य रोग केवळ सूर्यप्रकाशानेच सुधारण्याचे प्रयोग आज सिद्ध झाले आहेत. आर्यवंशज म्हणविणाऱ्या हिंदुजनांनी अग्निपूजा लाथाडून, सूर्योपासनेऐवजी भलभलत्या ३३ कोटी दगडधोंड्या देवांची उपासना चालू केली, त्या क्षणापासूनच त्यांचा ऱ्हास आणि अंधारात चालू झाला आणि आजच्या घटकेला ते परराष्ट्रांचे गुलाम बनून माणुसकीच्या हक्कानाही मुकले आहेत. पारशी इराण्यांसारखी मूठभर लोकसंख्येची जात सूर्योपासक व अग्निपूजक असल्यामुळे हव्या त्या भल्याबुऱ्या परिस्थितीत उत्कटत्वाने टिकाव धरून कां राहाते, याचा उलगडा हिंदुजन पुन्हा सूर्योपासनेकडे एकाग्रचित्ताने परततील, तरच त्यांना प्रत्यक्ष अनुभवाने पडताळता येईल. एरवी वायफळ फुराणे, प्रवचने काय कामाची? सूर्योपासना आणि अग्निपूजन बंद झाल्यामुळे हिंदूंच्या जीवन-विकसनाची संवेदनाच हतसंज्ञ झाली, या वर्माकडे मी अखिल हिंदु जनतेचे मार्मिक लक्ष्य विशेष अट्टहासाने वेधू इच्छितो.
सकळ दोषांचा परिहार । करिता सूर्यास नमस्कार ।
स्फूर्ति वाढे निरंतर । सूर्यदर्शन घेता ।।२२-१६-२.
२) जीवाने आपल्या विकसनासाठी रवि पासून प्रकाश घेतला की त्या प्रकाशाचेच परावर्तन मनावर होऊन, तेथे विकार आणि विचार यांचा जन्म होतो. कसा? सूर्याचा प्रकाश जसा चंद्रावर पडून आपल्याला चांदणे लाभते, कमळे उमलतात, समुद्राला भरती येते, त्यापमाणे म्हणजे चंद्र हा मनाचा व मनोविकारांचा कारक मनाप्रमाणे चंद्र सुद्धा चंचळ असून, त्याला क्षयवृद्धि होत असते.
३) मनोविकार पुष्कळ जमा झाले आणि समुद्राच्या भरतीप्रमाणे त्यांच्या उसळू लागल्या, पण त्यांच्यावर शुद्ध स्वच्छ मनाचे विवेकाचे नियंत्रण अगत्य पाहिजे. हा विवेकाचा पुरवठा करण्याचे काम बुध ग्रह करीत असतो. `बुधाची बुद्धी भारी` असे तात्याजी महिपतीने केलेले वर्णन सार्थ आहे.
४) मनोविकारांना नुसत्या नियंत्रणाची तोंडबेडी घालून काय उपयोग? ही बेडी लोखंडी अविवेकाची असो, नाहीतर सोनेरी विवेकाची असो, ती बेडीच. ती नुसती अटकाव करील. विवेकाने मनोविकाराना नियंत्रण घातल्यावर, म्हणजे मनुष्याने मनाला समतोलपणा आणल्यावर, स्वत:साठी आणि इतरांसाठी विशेषतः समोरच्या व्यक्तिसाठी, (पुरुषाने स्त्रीसाठी आणि स्त्रीने पुरुषासाठी) त्या मनोविकारांची एकतानता कशी साधावी, या कल्पनेचा उगम होतो. मनोविकारांची ही एकतान वाटणी करण्याचे काम शुक्र ग्रह करतो.
५) पण ही सर्व कामे सर्व काळी यथासांग थोडीच शेवटाला जातात? मध्यंतरी काही ना काही भानगडी उपस्थित व्हायच्याच. ठरलेले ध्येय प्र कृतीत उमटताना, जगाच्या व्यवहाराचे काही बरे वाईट संस्कार त्यावर पडतात आणि दुर्दैवाने जेथे आपण शांतीची कल्पना करावी तेथे भांडणतंटे घुसफूस बेबनाव दत्त म्हणून उभे. ध्येय गाठण्यासाठी चढचढ मनुष्य चढला. आता एकच उडी घेतली की शिखराचा कळस हाती लागलाच म्हणून जो पुढे सरसावतो तो पाय घसरून धडाड टेकडीच्या पायथ्याशी पालथा । काल ऐश्वर्याच्या स्वर्गात, तर आज अधःपाताच्या नरकात । अशा अध:पात झालेल्या मनुष्यानी स्वतःच्या मनगटाच्या जोरावर फिरून निळयाने आपले ध्येय गाठावे, पुन्हा आत्मबळावर नरकातून ऐश्वर्याच्या स्वर्गात उड्डाण करावे, अशी स्फूर्ति देण्याचे काम लढवय्या मंगळ ग्रह करीत असतो.
६) खडकाळ व्यवहाराच्या मैदानावरून कधी अडखळत ठेचाळत तर कधी हासत खिदळत, मनुष्याच्या जीवनक्रांतीचा प्रवास चालला असता, एकदा त्याला न्याय क्षमा भूतदया या सद्गुगांची पूर्ण ओळख पटली की त्याला पोटाशी धरायला गुरू ग्रहाची योजना झालेली आहे.
७) परंतु नुसत्या दया क्षमा शांतीच्या भांडवलावर जीवनोत्क्रान्तीचा कार्यभाग पूर्ण होत नाही. जेव्हा शनि त्याला आपल्या कोलदांड्यात अडकवून, धोब्यापमाणे चांगला आडवा उभा हाबकतो, तेव्हा आत्मानात्म विचार काय आहे, शुद्ध ज्ञान काय, त्याच्या शोधनप्रकाशाने अनेक गूढ प्रश्न सोडविण्याची सोपी युक्ती काय, ह्याचा शोध करण्याची आतुरता मुमुक्षुवृत्ति माणसात जागृत होते; आणि तो एकदा त्या आतुरतेच्या मार्गाने नीट जाऊ लागला की अखेरीस शनीच्या कोलदांड्यासारखा जिव्हाळ्याचा उपकारी मित्र दुसरा कोणी नाही, हेच त्याच्या प्रत्ययाला येते. तात्पर्य,एकादी आई आपल्या मुलाला सडकून चोप देते, किंवा `मर मेल्या कार्ट्या` म्हणते, म्हणजे त्या मुलाने आपला मार खाऊन ठार मरावे, अशी इच्छा असणे शक्य असते काय? मुळीच नाही. त्या मुलाने दुर्गुणी होऊ नये, सद्गुणी व्हावे, ही जी तिची इच्छा, तीच शनीच्या कोलदांड्या साडेसातीत गर्भित आहे.
(८) मनुष्याच्या जीवनाची उत्क्रांती केवळ उपरोक्त मुमुक्ष्वावस्थेने पुरी होत नाही. आजुबाजूला पसरलेल्या निसर्गापलिकडचेही निसर्गातील ज्ञान प्राप्त करावे लागते. त्या ज्ञानाचा ठाव लागल्या खेरीज, `मी कोण?` याचा उलगडा होणार नाही. हे निसर्गातती ज्ञान (सुपरनॅचरल नॉलेज) प्रजापति (युरॅनस, हर्शल) पासून प्राप्त होते.
(९) आणि अखेर-
अर्ज निर्विकल्पं निराकारमेकम् ।
निरानंदमद्वैतमानन्दपूर्णम् ।
परं निर्गुर्णे निर्विशेषं निरीहम् ।
असे जे परब्रह्माचे परमोच्च परम पवित्र ज्ञान त्याच्या अवगाहनाचा मार्ग वरून नेपच्यून दाखवितो.
सारे विश्व, सारी सृष्टी क्रान्तीसाठी धडपडत असते. मळमळीत ठराविक साच्याच्या जीवनाला क्रान्तीच्या या धसळामुसळीत मुळी जागाच नाही.
नित्य नवे, क्रान्ताला हवे
क्रांति म्हटली की अदलाबदल, तोडमोड, जाळफोड आलीच. नवग्रहांच्या सहाय्याने निसर्गात क्रान्तीचे चैतन्य अखंड थरारत ठेवण्यात बुद्धिप्रधान माणसांनी आत्मजीवनात क्रांति करून साऱ्या जगाला क्रांतीने जगवावे, हाच परमेश्वराचा हेतु आहे पण क्रांति म्हटली की आमच्या तंगड्या मटकन मोडतात. शांतीचा ऊरफोडी घोसरा धरून, सुखाच्या पाठलागातच आम्ही नेहमी गर्क साध्या टीचभर संसारात सुद्धा आम्हाला दुःखाचा लवलेश नसावासा वाटतो. सर्व काही सुरळीत चालावे. कोठे कसलाही अटकाव नसावा. क्लेश नसावे, सुखाच्या सर्व कल्पना हुकमी हातात याव्या, सर्व कारभार शांतपणे चालावा, ही आमची इच्छा. कोठे पायाला काटा बोचलेला आम्हाला सहन व्हायचा नाही. लगेच प्राणान्तिक बोंबाबोंब सुरू.
उदरंभरणाच्या धडपडीची यातायात जर नसती तर आम्ही सुखलोलुप हिंदी माणसे थडग्याप्रमाणे शांत अवस्थेत निश्चित पडून राहिलो असतो. अशा वृत्तीच्या शांतिप्रिय माणसांना साध्या संसारी संकटानी चक्कर यायची, तर ग्रहदशेचे जीवनविकासी फेरे मृत्यूपेक्षा भयंकर अन्यायी आणि जुलमी वाटून, ते आत्महत्येलाही प्रवृत्त झाल तर नवल कशाचे? बरे, सुख कोणते आणि दुःख कशाला मानावे, याच्या कल्पनाही आमच्या आम्हीय ठरविलेल्या आहेत. आमच्या सर्व धडपडीचा रोख त्या सुखाच्या कल्पनेच्या दिशेकडे अमूक प्रकारची धडपड केली तर मला अमूक प्रकारचे सुख मिळेल, यापेक्षा दुसरी कसलीही विवंचना आमच्या हालचालीत नसते. त्या सुखाच्या कल्पनासुद्धा आम्ही दुसऱ्या कोणाकडे आमच्या हिशोबाने सुखी असणाऱ्याकडे पाहून ठरवीत असतो. कल्पनेप्रमाणे सुखाची स्थिती लाभली तर आम्ही प्रयत्नवादाचे गोडवे गोतो; आणि प्रयत्नांचा कडेलोट करूनही जर ती ठराविक स्थिति प्राप्त झाली नाही, तर लगेच कट्टे दैववादी बनून दुःखाने हळहळू लागतो. या सगळ्या हासण्या रडण्यातले तात्पर्य इतकेच की
सर्व गोष्टी आमच्या मनाप्रमाणे व्हाव्या
इतकीच आमच्या महत्त्वाकांक्षेची सारी भरारी. दैववाद आमची डोकी प्रत्यक्ष फोडीत असला, तरी प्रयत्नवादावरही डोकी फोडायला आम्ही कमी करीत नाही पण या दोनही वादांच्या वादात देववाद मात्र अजिबात डावलून त्या अनंत ब्रह्माण्ड नायक परमेश्वराची आम्हाला चुकून सुद्धा आठवण होत नाही. जे देवालाच आम्ही विस्मरणाची बगल मारली, तेथे विश्वनियंत्रणाची आणि जीवविकसनाची देवाची शाखत इच्छा आमच्या अशाश्वत आणि तात्पुरत्या सुखाच्या पेनशनीत काढली, तर त्यात आह कसले?
असल्या शांतिमुमुक्षु मुर्द्याकडून क्रांतीच्या क्षेत्रात मर्दाची कामगिरी काय घडणार? आणि असले लोक ग्रहदशेच्या फेऱ्याच्या वावटळीत गवताच्या गुडीप्रमाणे भुर्रर्र उडून बेपत्ता का होणार नाहीत? त्यातच हिंदी पंचागबहाद्दरानी नीचे चित्र इतके भेसूर आणि भयंकर रंगविलेले आहे की त्याच्या दर्शनानेच माणूस पाऊणमेला होतो. शनि म्हटला की छातीत एकदम धडकी भरते. मृत्यू पत्करला पण ही शनीची साडेसाती नको, म्हणून पुष्कळ नामर्द शांतिपंढ आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. विश्वनियंत्रणात आणि विशेषतः मनुष्याच्या जीवनविकासात क्रांतिचे कोणते महत्कार्य साधण्यासाठी शनीची योजना आहे, याचा ते क्षणभरसुद्धा विचार करीत नाहीत.
ज्योतिष्यांकडे पहावे तो तेही मारुतीच्या तेलशेदरात आणि जप, जाप्याच्या भिक्षुकी एजन्सीत अडकलेले. रुईची फुले, तिळाचे तेलशेंदुर आणि टकल्या घोडभट या नवग्रहपीडानिवारक विजा पाश्चात्त्य देशांत अजून घुसलेल्या नसल्यामुळे तिकडील ज्योतिर्विदांनी शनीची चित्रे बन्याच विवेकबद्ध प्रमाणात रेखाटली आहेत. शिवाय ज्योतिष्यशास्त्राला तिकडे खगोलशास्त्राचे उत्कृष्ट पाठबळ असल्यामुळे, पाश्चिमात्य ज्योतिषी ग्रहदशेचा तपशील बऱ्याच विवेकवादी भाषेने देतात. याचा एक नमुना म्हणून मिस्टर ई. पार्कर कृत `अस्ट्रॉलजी` नामक ग्रंथातला शनीच्या साडेसातीविषयी एक उतारा पहा-
`Satan is the watcher on the Threshold of the Temple of the king; he stands in Solomon`s porch, he keeps the keys of the sanctuary. (The secret Doctrine part II, p. 285) Saturn is the last of the 7 planets belonging to our system, the circumference of that realm of which the sun is the centre, it is the planet of Limitation, of temptation and purification and therefore its effects in our lives are felt to be hindrance, opposition, trail. `He binds in fetters and limits all things` and through that very limitation gives us a clear conception of what lies before us. Saturn takes away from us our social ballast, our friend our deceptive pleasures, and leads us willingly or unwillingly into solitude where the `Voice of the Silence` may be heard. Therefore Saturn is the friend of those who thirst for insight and intensification of life; but to those who seek themselves and turn away from higher things, he is the inexorable judge able to compel and the destroy. Until in the end man comes to understand his language and blesses the iron hand that has guided him. For not until we have understood Saturn can we cross the threshold.
(Astrology and its Practical Application By E. Parker, P. 17)
भावार्थ- परमेश्वराच्या मंदिराच्या उंबरठ्यावर पहारेवाला म्हणून सॅटर्नची - योजना झालेली आहे. शनीला इंग्रजीत `सॅटर्न` असे नाव आहे. बायबलात `सेटन` येतो. तो जवळ जवळ शनिकर्माच असल्यामुळे, त्याचे `सैतान` असे मराठीत भाषांतर पुष्कळांनी वाचले असेल. पण सेटन म्हणजे सैतान नव्हे. वरच्या उताऱ्यात सॅटर्नच्या ऐवजी वापरलेला तत्सद्दश सेटन शब्द `सैतान` शब्दाच्या वाईट अर्थाने मुळीच योजिलेला नाही. किंबहुना सेटन काय किंवा सॅटर्न काय कोणीही वाईट नाही. हरिश्चंद्राच्या नाटकात विश्वामित्राची भूमिका नसती, तर ते नाटकच मुळी जन्मला आले नसते, मग हरिश्चंद्राच्या सत्त्वपरिक्षेला जगात कोणी कवडीची तरी किंमत दिली असती काय? सज्जन ज्या कमानीखालून मंदिराकडे जातात तेथेच तो उभा असतो. मंदिरातील मुख्य पवित्र दालनाच्या किल्ल्या सेटनच्याच ताब्यात असतात. (मॅडम ब्लावटस्की कृत सीक्रेट डॉक्ट्रिन, भाग २ पृष्ठ २८५)
"ज्या ग्रहमण्डळाचा सूर्य मध्यवर्ति केंद्र आहे, त्या ग्रहांत शनि हा शेवटचा ७ वा ग्रह होय. प्रत्येक वस्तुला अगर स्थितीला मर्यादित करणे, मोह उत्पन्न करणे आणि शुद्धीकरण करणे हे ह्या ग्रहांचे गुणधर्म आहेत. त्यामुळे मार्ग खुंटणे, विरोध होणे आणि कसोटीचा छळ होणे, इत्यादी परिणाम आपल्या जीवनावर होतात. लोखंडी कोलदांडे टाकून प्रत्येक गोष्टीला शनि अटकाव करीत असतो, आणि या अटकावामुळेच आपण पुढे कर्तव्याचा मार्ग कसा चोखाळला पाहिजे, याची स्पष्ट वा स्वच्छ कल्पना आपल्याला करून देतो. आपले सामाजिक स्थैर्य, आपले मित्र आणि आपण मानलेल्या सौख्यसाधनांतली भुलभुलावणी शनि आपल्याजवळून हिसकावून नेतो; आणि आमची खुषी असो व नसो, तो अखेर आम्हाला एकांतवासाच्या शांत वातावरणात नेऊन ठेवतो.
या एकांतवासातच शांतीचा गूढ संदेश आम्हाला ऐकू येतो. अर्थात ज्यांना अंतदृष्टीची तहान लागलेली आहे. आपल्या जीवनविकासासाठी जे तळमळत असतील, त्यांचा हितकर्ता मित्र शनीच होय. पण ज्यांची दृष्टी स्वार्थापुरतीच संकुचित, ज्यांना जीवनविकास नको, काही नको, टीचभर सुखाची लालसा कशीबशी भागली म्हणजे झाले, म्हणून जे उच्च व उदात्त तत्त्वांपासून दूरदूर पळतात, अशा लोकांना मात्र शनीचा रामटोल्या कचका सणसणीत चेचायला मागेपुढे पहात नाही. न्यायनिष्ठुर न्यायाधिशाप्रमाणे तो त्यांचे कान पकडून एकतर त्यांना `नको ते करायला लावील, नाहीतर त्यांचा कपाळमोक्ष करील, हवा तो छळ करील. हे सारे कोठपर्यंत?` एकदा मनुष्याला शनिची भाषा समजली, त्याच्या उद्दिष्ट हेतूची नीट जाणीव झाली आणि त्याच्या कदरबाज लोखंडी हाताने आपल्याला सन्मार्ग कसा दाखविला, याचे प्रत्यंतर पटेपर्यंत. शनीच्या कोलदांड्याचा शुद्ध अर्थ आमच्या जीवनात प्रत्यक्ष बिंबल्याखेरीज आम्हाला भगवदमंदिराचा उंबरठा ओलांडताच येणे शक्य नाही."
आपल्या जीवनविकासाचा क्रम, आपल्या आत्म्याची उत्क्रांति, आपल्या संकुचित स्वार्थाची किंवा खुषी नाखुषीची पर्वा न करिता, कान धरून किंवा मान पकडून, पुढे पुढे रेटीत नेण्याचे काम करणारा शनि हा एकच जबरदस्त ग्रह आहे. वरवर पाहाणाऱ्याला तो मृत्युपेक्षा क्रूर दिसतो, पण त्याच्या क्रौर्यात सुद्धा मातृहृदयाचे निःसीम सात्त्विक प्रेम असते. त्याच्या लोखंडी पंजाची चपराक आमची बत्तिशी पदच्युत करते आणि पुष्कळ वेळा तो आमची गचांडी पकडून आम्हाला भरल्या ताटावरून उठवतो, गजबजलेल्या इष्टमित्रांच्या घोळक्यांतून तो अचानक आम्हाला उखडतो आणि सत्तेच्या किंवा सौख्याच्या शिखरावर आमचे बूड टिकते न टिकते तोच तो आम्हाला फुंकरासरसा `परस्वाधीन जिणे आणि पुस्तकी विद्ये`च्या एकलकोंड्या निर्जनावस्थेत दूर झुगारून देतो. ठाकठीक चाललेल्या संसाराचे एक चाक चुटकांसरसे निखळून, त्याचे होत्याचे नव्हते करतो; आणि प्रयत्नवादाची शिकस्त करून यशाचा पेला ओठाशी लागतो न लागतो तोच त्यात तो माती कालवतो. पण यात शनीचा कसलाही दुष्ट हेतू केव्हाही नसतो. त्याच्या करणीत अन्याय नसतो. आमच्या बऱ्या वाईट करणीचे कणशः पृथ:करण करून, आमच्या जीवनओघाची वरचेवर शुद्धी शनि न करील, तर आमच्या उत्क्रांतीची प्रगति कधीच होणार नाही.
कसाशिवाय माल नाही, शनीशिवाय कस नाही
वरच्यावर प्रखर भट्टीतून तावून सलाखून निघाल्याशिवाय सोन्याचा कस ठरला जात नाही. अस्सल हिरा आहे की नाही, हे सिद्ध करण्यासाठी त्याला ऐरणीवर ठेऊन त्यावर घावत घालावा लागतो. खरा हिरा असेल तर तो घणाच्या घावाला डगमगणार नाही आणि अस्सल सोने भट्टीच्या धगोला भिणार नाही. पण त्यांचा कस लागण्यासाठी त्यांना ह्या भयंकर दिव्यांतून जावे लागतेच लागते. कित्येक सज्जन चांगल्या माणसांवर ग्रहदशेचा फेरा आग पाखडू लागला, म्हणजे आपण देवाला किंवा दैवाला दोष देतो, ही अज्ञानपणाची चूक आहे. त्या सज्जनांचा सज्जनपणा किती नंबरी कसाचा आहे. त्यांना कोलदांड्यात अडकवून तोंडघशी पाडले, किंवा वैभवाच्या शिखरावरून भिक्षांदेहीच्या पाताळात चिणले, नाना तऱ्हेची भलभलती आकर्षक आमिषे त्यांच्यापुढे नाचविली, आणि त्यांचा हवा तो छळ केला, तर ते सज्जन आपल्या उत्क्रांत ध्येयाला रामराम ठोकतील काय?
आपल्या सत्त्वाला पारखे होतील काय, आमिषांना भुरळून कर्तव्याची दिशा बदलतील काय, किंवा छळाला कंटाळून आत्महत्येचा निखालस भ्याड मार्ग पत्करतील काय, हेच शनिग्रहाला अजमाऊन पाहावयाचे असते. या कसोटीला जो उतरला, त्याला शनीकडून लायकीचे सर्टिफिकीट मिळते, की `हा हिरा अस्सल आहे`, `हे सोने शंभर नंबरी आहे.` शनीच्या परीक्षेत जो उतरला, त्याला मग साऱ्या त्रिभुवनात कोठे अटकाव नाही. राजकारणी सौद्याच्या सौदेगिरीसाठी आम्ही माणसे वर्षातून चार वेळा
रावबहाद्दर खानबहादुरांच्या भट्टया
उबवून शेकडो माणसांना महत्पदाचा सफेदा चढवितो. रावबहादुर खानबहादुर म्हणजे नरांतले नारायण ठरविण्याचा पाचकळ उपद्व्याप करतो. पण रावबहादुराला गाव विचारीत नाही आणि खानबहादुराच्या खाणीच्या मातीची कोणी मडकीही घडवीत नाही. असला उघडउघड लाळघोटीचा आणि जुलैचाटीचा चावट प्रकार निसर्गाच्या साम्राज्यात मुळीच नसल्यामुळे, देवाघरची रावबहादुरकीची पदवी मिळविण्यासाठी शनीच्या तेल्याच्या घाण्यात हाडे पिळून पिळून घ्यावी लागतात.
चणे खावे लोखंडाचे । तेव्हा ब्रह्मपदी नाचे ।।
ब्रह्मपदी नाचण्यासाठी लोखंडाचे चणे किती कठोर मर्यादेपर्यंत खाता येतात, ह्याचे चित्र यथातथ्य रंगविण्यासाठी कविजनानी हरिचंद्र आणि विक्रम ह्यांची उत्कृष्ट हृदयद्रावक कथानके आपल्या उज्ज्वल कल्पनाशक्तीने रंगवून, शेकडो वर्षे लोकांच्या स्मृतिपटलावर नाचती ठेवली आहेत. विक्रमापेक्षाही हरिचंद्राचे कथानक करुणरसाने विशेष रंगलेले आहे. विशेषत: व्यावहारिक आज दृष्टीने त्यात (विश्वामित्राने निर्माण केलेल्या चमत्काराशिवाय) अशक्य व विसंगत असे काहीच नसल्यामुळे हरिश्चंद्राची साडेसाती म्हणजे खराखुरा घडलेला इतिहास, अशाच भावनेने आज सारी दुनिया त्याकडे पहाते. हरिदासाच्या आख्यानात, पुराणिकाच्या व्याख्यानात आणि रंगभूमीवरील नाट्यप्रयोगात हरिश्चंद्राची कथा लागली की डोळ्यांतून अश्रूंचा पाट पाडल्याशिवाय घरी परतणारा प्रेक्षक श्रोता विरळाच! (कथा पुराणापेक्षा नाट्यप्रयोगाचे परिणाम मनावर फार जबरदस्त होतात. हल्लीच्या `बुकिश` (प्रोज गद्य)
नाटकांपेक्षा पूर्वीची पौराणिक नाटके हरिश्चंद्राख्यान फारच परिणामकारक वठवीत असत.) सांगलीकरांच्या पहिल्या पौराणिक मंडळीचा हरिश्चंद्राख्यान नाटकाचा प्रयोग मी ६-७ वर्षांचा असेन तेव्हा पहिला होता, पण त्याचे सर्व देखावे मला अजूनपर्यंत जशाचे तसे स्मृतिचक्षूंपुढे स्पष्ट दिसतात. २५ वर्षापूर्वी कै. वासुदेवराव जोशी (तिवरेकर ता. कर्जत. जि. कुलाबा) ह्यांची पूर्ण चंद्रोदय नाटक मंडळी पौराणिक हरिश्चंद्र नाटक करीत असे. `आमचा प्रयोग पाहून रडल्याशिवाय घरी परत जाणाराला तिकिटाचे पैसे परत` अशी त्यांची जाहीरातीवर ठळक अक्षरांची अट छापलेली असे कौतुकाची गोष्ट एवढीच की पैसे परत मागणारा एकही इसम शपथेवर कधी पुढे आला नाही.
केवळ स्वप्नात दिलेले वचन खरे
करण्यासाठी हरिश्चंद्राने आपल्या साम्राज्याच्या सम्राटपदाचा त्याग करावा राणी तारामती व राजपुत्र रोहिदास ह्यांच्यासह वनवासाचे अमानुष क्लेश शांत व धीरोदत्त वृत्तीने भोगावे, पदोपदी भुरळविणाऱ्या विश्वामित्राच्या मायावी आमिषांना बळी न पडता सत्त्वरक्षणासाठी तहान भुकेचीही पर्वा करू नये, अखेर काशीक्षेत्राच्या भर चव्हाट्यावर अयोद्धेच्या ह्या चक्रवर्ती राजाने सहकुटुंब आपल्या देहाची विक्री करावी आणि त्याच्या राजदंडधारी हाताना डोंबाघरी पाणी वाहून मसणवटीची राखण करण्याचा प्रसंग यावा, हे दृश्यच इतके हृदयभेदी आहे की कथानक वाचताच कल्पनेला मूर्च्छना येते, तर नाट्याप्रयोगासारख्या दृश्यकथानकाने प्रेक्षकांच्या भावनांचे होणारे पाणीपाणी डोळ्यावाटे कोसळले, तर त्यात नवल कशाचे? असे काय मोठे भयंकर दुष्कर्म गतजन्मी हरिश्चंद्राकडून घडले की ह्या जन्मी त्यावर ग्रहदशेचा फेरा इतक्या कल्पनातीत रीतीने उखडावा?
ग्रहदशेमुळे येणारी संकटे नेहमीच गतजन्मीच्या वाईट संचिताचीच फळे असतात, असे मुळीच नाही. पुष्कळ वेळा ती चांगल्या संचितांच्या सत्त्वाची परीक्षाही करीत असतात. संचित चांगले केव्हा? तर ते संकटांच्या भट्टीत तावून सुलाखून टिकेल तेव्हा. प्रत्येक गोष्टीला कसोटी ही पाहिजेच. जगाच्या व्यवहारात सज्जनांपेक्षा दुर्जनांवरच सुखांची चांदरात विशेष का झडते आणि दुर्जनांपेक्षा सज्जनांवरच ग्रहदशेची वक्रदृष्टी विशेष का फिरते, ह्या शंकांचा असाही खुलासा करता येणे शक्य आहे की, कसोटी लावायची ती नेहमी सोने हिरा माणिक ह्या मूल्यवान वस्तूनाच लावतात, दगड धोंडे माती शेण ह्यांचा कस लाऊन पहाण्याचा उपद्व्याप कोणीच करीत नाही. पारख करून महत्पदाला न्यावयाची वस्तू नेहमी `श्रेष्ठ`च असावी लागते. (कोणी म्हणताल की भूगर्भशास्त्री (Geologists) दगड घोडे मातीत डोके खुपसून पृथ:करण करीत असतात. होय. पण एखादी माती त्याला उत्तम आढळली म्हणून तिचा दागिना म्हणून कोणी उपयोग करीत नाही.
एखाद्या मातीत सोन्याचे कण आढळले, तर तेथे खाण सुरू करण्याची तो शिफारस करील. पण पुढे सुवर्णकणांची कसोटी पूर्ण झाल्याशिवाय मात्र `सोने` म्हणून कोणी भलतीच धातु पत्करणार नाही, किंवा हिरा म्हणून गारगोटी स्वीकारणार नाही.) कनिष्ठ क्षुद्र वस्तूला किंमतच नाही, तर पारख तरी कोणी आणि कशाची करायची? अर्थात् आत्मोन्नतीचे अढळ ध्येय नजरेपुढे ठेऊन जन्मानुजन्माच्या श्रेष्ठ आचरणाने जीवनविकासाचा मार्ग आक्रमणाऱ्या सज्जनांवरच ग्रहदशेच्या भट्टीत आपल्या सत्त्वाची कसोटी ठरवून घेण्याचे कठोर प्रसंग यायचे. ज्याचा `विक्रम` `उच्च जनीचा असेल` त्यावरच शनीच्या शुद्धीकरणाचा ज्वालामुखी भडकून त्याच्या सत्त्वाची कसोटी ठरायची. लौकिकी दृष्टीने दुर्जन कितीही सुखात लोळत असले आणि ऐश्वर्याच्या तूपसाखरेत घोळत असले, तरी त्यांचा जीवनविकास कनिष्ठ दर्जाचा असतो.
ते माणसाच्या देहाचे असले तरी त्यांच्या आत्म्याची उत्क्रांति पशुकोटीपलीकडे फारशी उत्क्रांत झालेली नसते. म्हणूनच पुष्कळ श्रीमंत लोक पशुवत् आचरणात आरपार रंगलेले दिसतात. श्रीमंत असल्यामुळे सत्ताबाज बनणाऱ्या बाजीरावांना साध्या माणुसकीचीही दृष्टी का नसते, आणि पुष्कळ प्रसंगी दया, क्षमा, शांति सारख्या उच्च गुणांना बेधडक लाथाडण्या इतकी त्यांची काळिजे फत्तरापेक्षाही कठीण असलेली कां दिसतात, याचे पुष्कळांना मोठे कोडे पडते. पण यात गूढ असे काहीच नाही. ज्यांच्या आत्म्याची उत्क्रांतीच मुळी पशुकोटीची, ते देहाने जरी माणूस असले तरी पशुवृत्तीपेक्षा त्यांच्या कायावाचामनाने अधिक कसल्या उच्चवृत्तीचे प्रदर्शन होणार? आणि नवग्रहांनी किंवा शनीने असल्या
माणशी गाढवांची परीक्षा
कोणत्या कसोटीने लावायची? नवग्रहांच्या किंवा शनीच्या दरीची ह्या सूट मिळालेली असते, असा प्रकार मुळीच नाही. परंतु कचऱ्याकडे जसे आपण फारसे लक्ष देत नाही, पण बराच उकिरडा साचला की त्याला भडाग्नी देऊन गतीला नेतो तसाच काहीसा प्रकार दुर्जनांच्या बाबतीत ग्रहांच्या दशेला करावाच लागतो. मग काय! सो सोनारकी और एक लोहारकी! दणका बसायचा अवकाश की ढेकूण चिलटांप्रमाणे खलास, असे काही होणार नाही. तर जगाच्या व्यवहारातला समतोलपणा पार नाहीसा होऊन, सारे ह्या जिवंत राहू, केतू, शनीच्या हातातले दुर्दैवी खेळणे होऊन बसले!
खरे विक्रमी आणि आत्मविकास-मुमुक्षू पुरुष असतात, ते सुख दुःखाच्या लौकिकी कल्पनांना बळी पडत नाहीत. लौकिकी सुख हे दुःखपर्यवसायी आहे आणि दुःखातच शाश्वत सुखाचा शोध लागत असतो, हे त्यांना चांगले उमगलेले असते. म्हणून आपल्या विशिष्ट ध्येयाच्या सत्त्वरक्षणासाठी ते आपला सुखातला जीव दुःखात लोटायला मागेपुढे पहात नाहीत. त्यांचा ईश्वरी न्यायावर अचल विश्वास असल्यामुळे ध्येयसाधनासाठी आणि सत्त्वरक्षणासाठी हव्या त्या प्राप्त परिस्थितीला वा संकटांना, डोळे उघडे ठेवून धीराने आणि शांत वृत्तीने तोड देतात. प्रयत्नांविरुद्ध किंवा देवाविरुद्ध कसलीही तक्रार करीत नाहीत. इतकेच नव्हे तर, अनेक जन्मसंसिद्धीने या जन्मी जवळ असलेले कसलेही श्रेयस खर्चा टाकून प्राप्त संकटाची किंवा दुःखाची तोडमिळवणी विक्रमी पुरुष कधीही करीत नाहीत.
उदाहरणार्थ, विक्रमाचीच गोष्ट घ्या. तामलिंदा नगरीच्या त्या भांडवल्या वैश्याने विक्रमावर हार चोरल्याचा आरोप घेतला, तेव्हा विक्रमाने "शहाण्या कोणावर चोरीचा आरोप करतोस? मी उज्जनीचा विक्रम चक्रवर्ती राणा आहे. चल तुझी खात्री करून देतो. तुझ्या पोरीच्या त्या हाराची बिशाद काय? असले हार माझे मोतदार घोड्यांच्या गळ्यात घालतात. तुला किती हार मोबदल्यात पाहिजेत तितके देतो. उज्जनीला चल." असा खडखडीत जबाब दिला असता, तर चंद्रसेनाची काय छाती होती एकदम बिना चौकशी शिक्षा ठोठावण्याची? पण विक्रम हा अस्सल `विक्रम`च असल्यामुळे त्याने आपले चक्रवर्तिपदाचे श्रेयस तशाही प्राणान्तिक अवस्थेत खर्ची घातले नाही. हरिशंदाने तर विश्वामित्राला के स्वप्नात वचन दिले!
स्वप्नात आपण सुद्धा कधी मधी राजे बनतो, पण सकाळी जागे झाल्यावर काय असते? ना दिवाण, ना दरबारी, ना हुजरे, ना दासी! आपणा न चहाचा कप आणि संसाराची ठराविक कर्मकटकट! राणीच्या जाहीरनाम्याला सुद्धा जर `रद्दीचे चिठोरे` ठरविता येते आणि दस्तऐवजावरची सही `माझी नाहीच` म्हणून `ईश्वराला स्मरून खरे` सांगता येते, तर केवळ स्वप्नात दिलेल्या वचनासाठी जिवंतपणी यमयातना भोगणारा हरिश्चंद्र आम्हा शहाण्या लोकांच्या दृष्टीने `बडा पागल`च ठरणार नव्हे का? बरे, नवरा `वेडा` झाला तरी त्याच्या बायकोने-राणी तारामतीने-तरी त्याच्या वेडेचाराला आळा घालावा? ती नवऱ्यापुढे शंभर कदम. लेक पहावे तर तेहि
वडलांच्या पावलावर पाऊल
टाकून आणखी दोनशे कदम पुढे. मग वेडे कोण? अर्थात आम्ही. कारण, या सत्त्वधीर त्रिवर्गानी आपल्या सर्वस्वावर उघड्या डोळ्यांनी निखारे ठेवले, पण स्वप्नात दिलेले वनच अक्षरश: पाळले. आपल्या सत्त्वाला लवमात्र दूषित होऊ दिले नाही. शनिकर्मा विश्वमित्राने पेटविलेल्या नानाविध ज्वाळात त्रिवर्ग शांत धीरोदात्त वृत्तीने उभे राहिले, पण सत्त्वाला पारखे झाले नाहीत. विश्वाची प्राणज्योति क्रांतीने पाजळलेली आहे, हे लक्ष्यात घेऊन, सत्त्व कसोटीला लावणाऱ्या संकटांना आणि आपत्तीना जो आनंदी वृत्तीने आणि शांत चित्ताने तोंड देतो, तोच मर्द, तोच खरा वीर, आणि तोच देवाचा लाडका!
दुःखाची चरचरीत फोडणी पडल्याशिवाय सुखाची कढी कधी खमंगच व्हायची नाही, हा मानव जीवन विकसनाचा सनातन सिद्धांत आहे. ही फोडणी किती कमाल मर्यादेपर्यंत कडकडते, आणि तशाही सर्वस्वनाशाच्या प्रसंगी विक्रमी पुरुष आपल्या सत्त्वाला प्राणापेक्षाही किती आतुरतेने सांभाळतात, ह्याची उज्वल चित्रे कविजनानी विक्रम, हरिश्चंद्र, नळ इत्यादि थोर थोर पुरुषोत्तमांच्या चरित्र कथानकांनी रंगवून ठेविली आहेत, आणि ती अनेक विचारवंतांच्या चारित्र्याना आपत्प्रसंगी चैतन्यदायक होतही आहेत. या कथा केवळ काल्पनिक कादंबऱ्या मानणाऱ्या चिकित्सकाने चिकित्सापूर्वक सभोवार नजर टाकली आणि गतकालीन सर्व राष्ट्रांच्या व विशेषतः भरतखंडाच्या इतिहासाची पाने चाळली, तर त्याला हरिश्चंद्र आणि विक्रमाचे नमुने ठिकठिकाणी कितीतरी आढळून येतील. सत्वधीर पुरुषांची कसोटी ग्रहदशा किती भयंकर दिव्याने लावते, आणि तशाही दिव्यातून ते सत्त्व-सलामत बाहेर कसे पडतात, ह्याचा चालता बोलता दिव्य चित्रपट म्हणजेच पांडवांचा इतिहास नव्हे काय?
जातस्य हि ध्रुवो मृत्यृर्धवं जन्म मृतस्य च ।
तस्मात् अपरिहार्येऽर्ये न त्वं शोचितुमर्हसि ।।
स्वधर्ममपि चविक्ष्य न विकांपितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धाच्छेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ।।
हतो वा प्राप्स्यासि स्वर्ग जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः ।।
असल्या चैतन्याच्या संदेशाने सारी दुनिया थरारून सोडणारा गीता- कोहिनूर ज्या खाणीने, सहज एक नमुना म्हणून, बाहेर काढला, त्या महाभारतात कशाची उणीव पांडव काल्पनिक व्यक्ती नव्हते, किंवा महाभारत म्हणजे कादंबरी अथवा पुराण नव्हे. ग्रंथाच्या शोभेसाठी किंवा महाभारत म्हणजे कादंबरी अथवा पुराण नव्हे. पंचाच्या शोभेसाठी आणि स्वतःच्या विद्वत्तेच्या मुक्तीसाठी कवींनी मधून मधून काव्यकल्पनेच्या वेलबुट्ट्यांची कितीही नक्षी रंगविलेली असली, तरी
महाभारत शुद्ध इतिहास आहे
विक्रम हरिश्चंद्राप्रमाणे पांडवांच्या सत्यपरीक्षेचा इतिहास एकदेशी एकरंगी नाही ग्रहदशेचे फेरे जितक्या उलट सुलट आणि उग्र विकट तन्हांनी फिरणे शक्य आहे तितक्या सर्व तन्हांचा मारा पांडवांवर होऊन त्यांची सत्वपरीक्षा कसोटीला लागली. विशेष लक्ष्यात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा सारखा पुरुषोत्तम पांडवांचा पाठीराखा असताही त्यांच्या ग्रहदशेच्या आपत्तीचा एक अणुरेणूसुद्धा टाळला गेला नाही, की संकटाची एकादी वेदना शमविली गेली नाही. दुर्दैवाच्या आपत्तीचे सर्व फेरे आणि त्यातली सर्व लहान मोठी दुःखे पांडवांना भरपूर भोगावी लागली. असे का? ज्या श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला आणि कुंतीला विश्वरूपदर्शन देऊन आपले चराचर विश्वव्यापकत्व चुटकीसर सिद्ध करून दाखविले, त्याला धर्माच्या हातातले जुगारी फासे, भीमाने वेळपाट लाटणे, अर्जुनाची `सैय्या भैया` आणि द्रौपदीचा सैरंध्रीपणा टाळता आला नसता काय?
पांडवांसारख्या पापभीरू सत्यनिष्ठ अजिंक्यवीरांवर दाती तृण धरून बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासाचा प्रसंग यावा. अर्वाचीन साम्राज्यवादी सत्ताधाऱ्यांच्या गुर्मीत सत्तांध बनलेल्या कौरवांनी त्यांच्या हवा तो अनिर्वाच्य छळ करावा आणि कंसचाणूरमर्दक गोवर्धनधारी श्रीकृष्णाने पांडवांची सर्व ग्रहदशा उपचा डोळ्यांनी पहावी हे चमत्कारिकच नव्हे काय? सुदर्शन चक्राच्या एका फेकीत साऱ्या कौरवांना रसातळाला नेण्याचे ज्या श्रीकृष्णप्रभूचे सामर्थ्य, हाक भारताच जो देवी दौडीच्या पाठीमागे हात जोडून उभा, त्याला पांडवांचा झालेला भयंकर छळ मूळातच उखडता नसता का आला? आला असता. पण! पण काय? पांडवांच्या सत्त्वचीरपणाचा पांडुरंग ग्रहदशेच्या भट्टीतच जसा ताऊन सुलाखून कसाला लागला, तसा तो श्रीकृष्णाच्या दैवी मध्यस्थीने मुळीच लागला नसता. परमेश्वरच निसर्गाच्या ताळेबंद नियमात सवलतीचे आणि सुटीचे धेरै भक्तजनांच्या प्रेमाखातर माजवू लागले, तर विश्वनियंत्रणाची कदर ताबडतोब कोलमडून परमेशरालाही बेपत्ता झाल्याशिवाय गत्यंतर उरणार नाही.
सत्त्वपरीक्षेचा कडेलोट
झाला म्हणजे भक्ताच्या घ्याव्याला देव खास धावतो; पण कसल्याही सबबीवर सत्त्वपरीक्षेच्या कसोटीची माफी देवाच्या पीनल कोडात आढळणार नाही. भर दरबारात एका प्रतिष्ठित स्त्रियेचे वस्त्र फाडून तिची नागडी उघडी विटंबना करणाऱ्या, मानवी कल्पनेलाही अज्ञात अशा बीभत्स अरेरावीपर्यंत जेव्हा कौरवांच्या साम्राज्यसत्तामदाची मजल गेली आणि देवी द्रौपदीने श्रीकृष्ण परमात्म्याचा आक्रंदून धावा केला, त्यावेळी तो भक्तवत्सल कसा स्वस्थ बसेल? पतिव्रता
निष्पाप बाईच्या निरीला हात?
विश्वाच्या ठिकऱ्या उडतील आणि परमेश्वराचे कोळसे होतील. देवी द्रौपदीच्या निरीला हात? श्रीकृष्ण परमात्म्याच्या अनन्य भक्ताच्या अब्रूचे छिनाल धिंडवडे? भारतसम्राटाच्या दरबारात पांडवांची पट्टराणी नागडी उघडी होणार? काय त्या साम्राज्याला आग लावायची, त्या सम्राटाला उभा पेटवायचा आणि परमेश्वराच्या भक्तवात्सल्यावर पेट्रोल ओतायचे! अरे अरे अरे! आता त्या पापग्रह दुःखासनाने एकच हिसडा मारला की देवी द्रौपदी जिवंतपणीच मेली आं?
दुःशासन सोडाया झोंबे स्वकुळाहितोदय लुगड्या ।
तेव्हां स्मरली कृष्णा, कृष्णा दीनांचिया दयालु गड्या ।।
तो दुर्जन आधी ही साधूंच्या करुनि हानि रीतीची ।
नग्न सभेंत कराया पाहे खेळ धरूनि हा निरी तिची ।।
जैं दुर्दशा कराया दुर्दैवें सिद्ध नीच हा केला ।
तैं दीनबंधुला ती कृष्णा मारी मनीं च हाकेला ।। मोरोपंत
जगातले सारे व्यवहारपटु चोर आपल्या पिंडजात स्वार्थाच्या चष्म्यातून न्याय अन्यायाची मिमांसा करू लागले, सत्ताबाज बाजीरावांच्या हलकट लहरीच्या मुर्वतीस्तव ‘नरो वा कुंजरो वा` ने धर्माच्या परम सूक्ष्मत्वाच्या फोलकड सबबीवर दगडी पुतळ्याचे मौन पत्करू लागले, आणि अन्यायपीडित हतबलांना माणशी न्यायाच्या मशिदीत न्याय मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाले, की त्याला परमेश्वराशिवाय कोणाचा आधार? देवाशिवाय कोणाची याचना करावयाची? तोच दयानिधी, तोच करुणासागर, तोच मायमाऊली त्यालाच करुणेचा पाझर फुटायचा, म्हणून द्रौपदीने श्रीकृष्ण भगवंताचा टाहो फोडून चावा केला.
हे नाथ! रमानाथ! वज्रनाथ! हरे! मुकुंदा कंसारे! ।
गोविंद! कृष्ण केशव! दीनार्तिहर सत्यमेव संसारे ।।
काळें हि सख्या! न तुझ्या दासीस पहावयासहि न सकवे ।
त्वद्भभगिनीवस्त्र खळे नग्न करायास काय हिसकावें? ।।
जीहुनि नसे सुभद्रा तुज बहुमान्या, अकीर्ति के तीची ।
धांव दयाब्धे! होते विश्वांत तुझ्या अकीर्ति हेतीची` ।।
`भगिनी` ऐसे वदल्यें, परि फार चि लाजल्ये, न हें लटिकें ।
प्रभुजी! रक्षा, तुमच्या दासांची मी लहानसी बटिका ।।
तो भगवान! भो वत्सल! भो हतचाणूरमल्ल! भागावें ।
विश्वें तुझेंचि, दुसरें न, यश श्रीप्राणवल्लभा! गावें ।।
आजि असत्परपुरुषस्पर्श, न अपराध, अन्य केला हो! ।
झांका प्रसादपदरें न कुजनहक्स्पर्श` कन्यकेला हो! ।।
(१. स्वकुळ नाशाच्या उपायाकरितां, २. द्रौपदी)
द्रौपदीनें त्या करुणासागराची, गोवर्धनचारी श्रीकृष्ण परमात्म्याची करुणा भाकताच,
अवतरला उतराया जो दुःसह दुष्टभार महिवरला ।
अहिवरलास्यपटु प्रभु करुणोकें द्वारकेंत गहिवरला ।
परमेश्वर रूप धरी स्वपर-जन-हितोदया लुगडियांचे ।
निववाया सभ्यांसह नयन मनही तो दयालू गडियांचे ।।
हा अंबरावतार श्रिलज्जारक्षणार्थ अकरावा ।
प्रभुमत असें, सदवनी आग्रह वेषी कदापि न करावा ।
द्रौपदीचा धावा ऐकताच भगवंताने अंबरावतार धारण करून-
शेलें शालू साइया क्षीरोदक लांबरुंद पाटावे ।
झाला अनंत वस्त्रे, कीं तीस अनाथसें न वाटावे ।।
पदसेवार्थ चि भजती अनवरत महाविभूति ज्या निपट ।
तो कृष्णावपु झांकी होवूनि महाविभूतिजानि पट ।।
१. संसारात दोन जनांचे दुःख हरण करणारा तूच आहेस. २. त्या तुझ्या बहिणीची (माझी). ३. शास्त्राची ४. खोटे ५. कष्टी व्हावे (धावत यावें) ६. दुष्ट परकी पुरुषाचा स्पर्श ७. दुष्टांच्या दृष्टीचा स्पर्श. ८ `क` हा प्रत्यय वात्सल्य, अनुकंपा व अल्पत्व दर्शवितो. ९. सर्वश्रेष्ठ जो कालीया त्याच्या फणांवर नृत्य करण्यांत कुशल असा. १०. आपल्या भक्तजनांच्या उत्कर्षाकरितां. ११. मत्स्यकूर्मादि दशावतार व हा अकरावा १२. साधूंचे रक्षणविषयी १३. पांढरे पातळ. १४. रेशमी वस्त्रे १५. नित्य, अखंड. १६. महाविभूती (लक्ष्मी) आहे जाया ज्याची तो (कृष्ण)
हा पट-वर्धनाचा चमत्कार कसा घडून आला? घडून येणे शक्य आहे काय? वगैरे पुष्कळ शंका चिकित्सकाना नेहमीच येतात. पण हे `चमत्काराचे` कोडे चिकित्सकांकरिता मुळी नाहीच. पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा? जावे त्यांच्या वंशा कळे! परमेश्वर आणि त्याचे अनन्य भक्त यांच्या मधला ऋणानुबंधाचा हा संबंध दोघांपेक्षा तिसऱ्याला उमगणार कसा आणि उलगडणार कसा?
या प्रसंगाप्रमाणेच सर्व संकटांच्या प्रसंगी पांडवांनी आपली शक्ती किंवा श्रेयस खर्ची घालून, ग्रहदशेच्या फेऱ्याला म्हणजे तजन्य विपरीत परिस्थितीला विरोध कधीही केला नाही. द्रौपदीवस्वाहरणाचा प्रसंग घ्या. त्यावेळी मनातच आणले असते तर एकट्या भीमाने तेथच्या तेथे धृतराष्ट्राच्या शंभर पुत्रांची नरडी फोडून सारा दरबार मसणवटी बनविला असता. भीम खवळलाही होता, परंतु
आम्हां व्यसनांर्तांची धर्मस्थिती हेचि बाज, पावे गा ।
त्वां मोडावे न इला, स्वस्वास्थ्यसुखार्थ या! जपावे गा ।।
अशी अर्जुनाने विनवणी केल्यामुळेच, तो काळाचा काळ भीम चरफडत स्वस्थ बसला. प्राप्त परिस्थिती देवाचा प्रसाद समजून, आपल्या जीवनविकासासाठी, येतील त्या संकटांना मर्दाप्रमाणे तोंड देण्यातच, त्या
संकटात ईश्वरी संदेश
आपल्याला उगमू लागतो. तलवारीला धार देण्यासाठी तिचे पाते सहाणेव्या चाकावर धरून घासावेच लागते. टणाटण ठिणग्या उडतात. पात्याचा खर्रखस्स खरखस्स आवाज सारखा निघतो. पण चक्रीसहाणेवरच्या त्या भयंकर दिव्यातून ते पाते बाहेर पडले की त्याच्यापुढे विरोधाला कोण उभा राहील? तद्वतच आपल्या जीवनाचा विकास, आपल्या शक्तीयुक्तीचा पराक्रम तलवारीच्या पाल्याप्रमाणे लेखदार आणि तेजस्वी करून घ्यायचा असेल, तर ग्रहदशापात आधीव्याधीना न कंटाळता, त्यांना शांत वीरोचित वृत्तीने कवटाळून त्यांच्या ठिणग्यात आत्मोन्नतीचा ईकरी हेतू काय आहे, तो हस्तगत करूनच घेतला पाहिजे. संकटांच्या द्वारे देव आमच्या आत्म्याच्या उत्क्रांतीची कमावणी अंदाजित असतो. जितकी आमची उत्क्रांती अधिक तितका अधिक जोराचा दाब संकटांच्या चक्री सहाणेवर आमच्या जीवनाला तो देतो. साध्या लोखंडाच्या सुरीला दगडावर सहज घासली तर धार येते, आणि ती धारही तात्पुरतीच असते. पण समशेरीचे पाते पक्क्या पाण्याचे पोलादी असल्यामुळे त्याला कचकचीत सहाणेवरच रगडावे लागते. जितका अधिक पाणीदार पुरूष, तितकी अधिक जबरदस्त कसोटी त्याला अहदशेच्या चक्री सहाणेवर भोगणेच प्राप्त असते.
तलवार कितीही कडक पात्याची पाणीदार असली, तरी तिला वरचेवर सहाणेवर धरून धार द्यावीच लागते. एकदा धार दिली म्हणजे जन्मभर टिकत नाही. फार झाले तर एखादी मोहीम पार पाडील. पण ती अखंड पाजळलेली राखायची तर तिला मुदतबंद धारेवर धरणेच प्राप्त असते.
जीवनविकासाला लागणाऱ्या आत्मिक चैतन्याची गोष्ट अशीच आहे. डा चैतन्यालाही वरचेवर ग्रहदशानिर्मित आपतीच्या चक्री सहाणेवर धार दिल्याशिवाय ते उत्तम काम करू शकत नाही. बॉयलरमध्ये वाफेचा अखंड पुरवठा नसेल, तर इंजिन चांगले चालणार नाही. वाफ जसजशी खर्ची पडत जाईल, तसतसा कोळसा पेटवून पाणी घालून वाफेचे ठराविक प्रमाणे अखंड राखावे लागते. मुंबई कलकत्त्याला आता विजेच्या रेलगाड्या सुरू झाल्या आहेत. (आता `आगगाडी` शब्द मागे पडून `वीजगाडी` शब्द रूढ झाला पाहिजे) माथ्यावरील तारेतून बिजलीचा पुरवठा होत असला, तरी खुद्द वीजगाडीत इलेक्ट्रिक एनर्जीचा पुरवठा करणारा डायनामो अखंड चालूच असतो. पॉझिटिव आणि निगेटिव विद्युत्प्रवाहांचा संयोग होतो तेव्हा विद्युच्चैतन्याची ठिणगी पडून वीजगाडी धावू लागते. माथ्यावरच्या तारेत पुष्कळ विद्युत्प्रवाह असला, पण खुद्द गाडीच्या पोटातला डायनामो जर रुटखुद करू लागला किंवा अज्जीबात बंद पडला, की वीजगाडी ठिकच्या ठिकाणी थंडगार! म्हणून
डायनामोची एनर्जी अखंड भरपूर
राखण्यासाठी रेल्वे कंपनीचे इंजिनीयर डोळ्यात तेल घालून अखंड श्रमात असतात. ह्याच नियमाप्रमाणे प्रत्येक व्यक्तिमात्राच्या आत्म्याच्या उत्क्रांतीच्या डायनामोमध्ये जीवनविकासाची एनर्जी किती कमीजास्त आहे, ह्यावर काटेकोर नजर ठेवण्याची कामगिरी सृष्टीविधात्याने नवग्रहांकडे सोपविलेली असून, ह्या इंजिनियर खात्याची मुख्य सूत्रे शनिग्रहाच्या हाती आहेत. या शनि इंजिनियरची तपासणी ३० वर्षांनी असते.
आमच्या डायनामोमध्ये एनर्जीचा पुरवठा बहुतेक दिवाळ्यातच निघालेला असतो. मग ही चीफ इंजिनियरांची स्वारी आपल्या असिस्टंटांवर भयंकर उखडते. कोणाची कसलीही सबब न ऐका ताबडतोब तो डायनामो स्वतःच निखळू लागते. सारे सांधे स्क्रू खिळे पट्टया वगैरे सर्व सामान निखळून त्याची धूसपूस पॉलीश रिपेर स्वतः हाती घेते. वाकडे तिकडे भाग घणाचे घाव घालून सरळ करते. सरळ झाले नाहीत तर नवीन बसविते. गंजलेली यंत्रे उकीरड्यावर झुगारून देते. कित्येक लिबलिबित स्पिंगांना भट्टीत भाजून पाणी चढविते. असा हा रिपेरीचा धूमधडाका साडेसात वर्षे स्वतः चालवून, तो डायनामो फर्स्टक्लास एनर्जी देणारा बनला, की पुढे साडेबावीस वर्षे त्याच्या कामाकडे पहावे लागत नाही. बिनखटका एनर्जी चालू. खुद्द बडे इंजिनिअर साहेब डायनामोची रिपेर करीत असल्यामुळे, त्याच्या पुढील साडेबावीस वर्षाच्या समाधानकारक कामाची निराळी विमा पॉलिसी घ्यावीच लागत नाही.
हिंदी ज्योतिषांनी शनिग्रहाची चित्रे भेसूर आणि भयंकर रंगविल्यामुळे, त्याच्या दशेच्या फेऱ्याचा आमच्या जीवनविकासावर होणारा क्रांतिकारक शुभ परिणाम अजमावण्याची आमची बुद्धी महिरून गेलेली आहे. त्यामुळे कर्तव्य काय, अकर्तव्य कोणते, संकटाचा मूळ हेतू काय, आपत्यप्रसंगी कसे वागावे, कठोरतम कष्ट सहन करूनही आपले ध्येय, त्याचे सत्त्व, कसे जिवापाड रक्षण करावे, इत्यादी महत्त्वाची आमची जाणीवच ठार मेली. अर्थात् सुख दुःखाच्या भलभलत्या कल्पनांच्या भरी भरून पुष्कळ मूर्ख
आत्महत्येचा हलकट भ्याड मार्ग
पत्करतात. (`आत्महत्या म्हणजे `आत्मा हत्या` असे पुष्कळ लोक समजतात. ती त्यांची गैरसमजूत आहे. आत्म्याची हत्या कोणीही करू शकत नाही आणि त्याच्या उत्क्रांतीसाठी जन्मोजन्मी भोगावी लागणारी सुखदुःखे आत्महत्या करणाऱ्यालाही कधी टाळता यायची नाहीत. या जन्मी देहाचा नाश करून नामर्द पळाला, तरी पुनर्जन्माच्या देहाची यातायात त्याला थोडीच टाळता येणार आहे? आत्म्याने देहाचा पोषाख चढविला की भोक्तृत्वाचा ससेमिरा लागलाच मागे!) साडेसात वर्षे आमच्या जीवनाच्या डायनामोची डागडुजी करून आत्मविकासाच्या एनर्जीचा झरा पुढे साडेबावीस वर्षे अखंड उपभोगण्याची सोयीची सवलत देणारा शनि ग्रह आम्हाला शत्रूप्रमाणे आणि मृत्यूप्रमाणे भयंकर का वाटतो, त्याची कारणे आमच्या अज्ञानाच्या तळघरातच कोठच्या तरी अडगळीच्या कोपऱ्यात कुजत उसली पाहिजेत खास.
साडेसात वर्षांची कमाई खर्च करायला साडेबावीस वर्षांची मुदत. अर्थात ही मुदत संपण्याबरोबरच आमच्या कमाईचेही भांडवल संपुष्टात येते. एनर्जी देण्याची आमच्या डायनामोची पॉवर लंजूर पडते. म्हणून पुन्हा ३० वर्षांनी शनि इंजिनिअरचा इन्स्पेक्शन रिपेरीचा दौरा येतो. त्या दौऱ्यालाच साडेसातीचा फेरा असे म्हणतात. ह्यात अनिष्ट भयंकर आत्मनाशक असे आहे तरी काय? तलवारीचे पाणी गेले तर ते जर वरचेवर द्यावेच लागते, वीजगाडीच्या डायनामोच्या बॅटऱ्या जर मंद पडल्या तर त्यांचीही उलथापालथ आणि अदलाबदल करावी लागते, तर ३० वर्षांनी आमच्या जीवनविकासाच्या चैतन्याची वासपूस करायला शनिग्रहाच्या साडेसातीची आवश्यकता किती अगत्याची आहे, याच वाचकांना आता स्पष्ट पडताळा पटलाच असेल.
****
प्रकरण ११ वे
थेट खुद्दाच्या दरबारात
हरीभजनावीण काळ घालवू नको रे ।।धृ।।
दोरीच्या सापा भिऊनि भवा । भेटी नाही जिवा शिवा ।
अंतरीचा ज्ञानदिवा । मालवू नको रे ।।१।।
विवेकाची ठरेल ओल । ऐसे बोलावे की बोल ।
आपुले मते उगिच चिखल । कालवू नको रे ।।२।।
संतसंगतीने उमज । आणुनि मनी पुरते समज ।
अनुभवावीण मान । हालवू नको रे ।।३।।
सोहिरा म्हणे ज्ञानज्योति । तेथे कैचिं दिवस राती ।
तयाविणें नेत्रपाती । हालवू नको रे ।।४।।
रात्री अंधार पडला की आपण दिवा लावतो. रात्री कोठे बाहेर जायचे तर ठेच लागू नये, विंचू काटा चावू नये, रस्ता चुकू नये, दोरीला साप समजून दचकू नये, म्हणून आपण बरोबर दिवा घेतो. पूर्वी मशाली असत, त्यांना वाऱ्यांचा उपद्रव होत असे. आता ती अडचण वादळी दिवे (हरिकेन लॅन्टर्न) आणि बिजली बत्त्या (इलेक्ट्रिक टॉर्च) ह्यांनी साफ नाहीशी केली आहे. इतकी व्यवस्था सहजसाध्य असूनही एखादे धोंड भटजी किंवा तिस्मारखा अंधाऱ्या रात्री रात्री काळोखातून मजला मारीत निघाले आणि एखाद्या खोड्याच्या आयत्या थडग्यात समाधिस्त झाले, तर मूर्ख कोण? अंधार घालिवण्यासाठी दिवा लावलाच पाहिजे. ग्रहदशेचा अंधार पसरून बुद्धी बुळबावळी बनली तर अंतरिचा ज्ञानदिवाच ईश्वरभक्तीची कात सरसावून प्रदिप्त केला पाहिजे. विक्रमालासुद्धा प्रथम दीपरागच आळवावा लागला, तेव्हा पुढे श्री रागाचे सूर त्याला आपोआप स्फुरले. ज्ञानदीप उजळला की अंतःकरणात उजेड पडून बुद्धी डोळस बनते, आणि ती अवघ्या जगाकडे उजळ दृष्टीने पाहू लागते. दृष्टी उजळ झाली की सारी सृष्टी निराळी दिसू लागते. साडेसातीच्या तुफानी तडाक्यात लंजूर झालेल्या विचारांना सकसपणा येऊन आचारांची गती विशेष तेखदार आणि दणदणीत होत जाते. जसा विचार तसा आचार म्हणून विचार यंत्राची विशेष काळजी घेणे जरूरी आहे.
ज्यांस आहे विचार । ते सुखासनीं झाले स्वार ।
इतर जवळील भार । वाहातचि मेले ।।३-९-८
पुरुषार्थाची सिद्धी आचाराने होते आणि आचाराची सिद्धी विचारांनी साधावयाची असते. म्हणून शारीरिक स्वास्थ्यासाठी आपण जेवढी काळजी आणि फुफ्फुसाची (हार्ट व लीवर) काळजी घेतो, तेवढीच, किंबहुना विशेष आपल्या विचारांची घेतली पाहिजे. विचार लंजूर पडले, डळमळले, गंजले की सारा कारभार रद्दीत निघालाच.
शुद्ध विचाराची एकाग्रता
ही एक दिव्य प्रभावशाली शक्ती आहे. हिला कोणतीही परिस्थिती पादाक्रांत करू शकत नाही. शनीची साडेसाती येवो, नाहीतर तिच्या बापाचा बाप येवो, ही शक्ती काही काळ लोहाप्रमणे वाकली तरी अखेर ताठ उभी राहिल्याशिवाय रहात नाही. दृढनिश्चय आत्मविश्वास वगैरे कल्पना याच शक्तीत सामावलेल्या असतात. एकाग्र विचारांच्या तीव्रतेने मृत्यूच्या पाशालाही अटकाव करून `थांब म्हणणाऱ्या वीरांची उदाहरणे पुष्कळ आहेत.
शिवरायाची तोफ जोंवरी पडे न मम कानी ।
तोंवरि आला काळ तरी त्या ठेचिन लाथांनी ।।
ह्या वीररत्न बाजीप्रभू देशपांड्याच्या उद्गारात हीच शक्ति उत्कटत्वाने सणाणली, आणि अखेर त्याच्या हुकमी इच्छामरणाने मराठी इतिहासात आचंद्रार्क दणाणली. ह्या शक्तीचे दुसरे चिरंजीव दृश्य म्हणजे
शिवरायाचा आग्रा येथील औरंगजेबाशी मुकाबला
"हे हिंदवी स्वराज्य व्हावें हें श्रीच्या मनांत फार आहे" ह्या एकाच एकाग्र विचाराला "प्रतिपच्चंद्ररेखेव" आपल्या हृदयात `वर्धिष्णु करणाऱ्या शिवरायावर परिस्थितीचा फास पडला आणि जयसिंगासारख्या बादशाही झब्बूच्या थोपबाजीला भुरळून तो आग्य्रास अचानक बादशाही अटकेत अडकला. आग्ग्रास जाताना हत्तीच्या अंबारीत बसून तो दख्खनचा सिंह रायगड उतरला, तो तीन महिने नजरकैद आणि सहा महिने जंगलाच्या पायपेटीचा भयंकर वनवास भोगून,
कटी लंगोटा येऊनी भिकेचा लोटा ।।
अशा गोसाव्याच्या वेषाने रायगडला परत येतो आणि अहल्लक गर्जना करून मातोश्रीच्या चरणांवर लोळण घेतो, ते कोणत्या चैतन्याच्या जोरावर? ज्याच्या नुसत्या नावाचा दरारा अवघ्या आसेतुहिमाचल भरतखंडात थरकाप उडवीत होता, ज्याचा शब्द झेलायला तानाजी सारखे हनुमंत आणि बाळप्रभू सारखे मसलती चित्रगुप्त शेकड्यांवरी हात जोडून उभे आणि ज्याच्या नुसत्या स्वराज्यपूर्वक ऐश्वर्याने विजापूरची सुलतानशाही दिग्मूढ चकित झालेली, त्या महत्त्वाकांक्षी तरुण शिवाजीवर नजरकैदेचा आणि अंगाला राख फासून कंदमुळे खातखात, लपतछपत जंगले तुडवीत, भणंग भिकाऱ्याप्रमाणे वणवण भटकण्याचा प्रसंग यावा ह्या विपरीत परिस्थितीची, ग्रहदशेच्या ह्या नरकवासाची, किंवा शनीच्या साडेसात्या कोलदांड्याची वाचकांनी सहृदयतेने कल्पना केली, तरच शिवरायाच्या वज्रप्रहारी विचारशक्तीच्या महिमा त्यांच्या कौतुकाच्या समुद्राला अपरंपार भरती आणील.
हिंदवी स्वराज्य झालेच पाहिजे
ही एकच कल्पना, हा एकच निश्चय, हा एकच विचार शिवाजीच्या तनुमनाच्या अणुरेणूत बिजलीप्रमाणे सणाणता सणाणता त्याच्यात इतका एकजीव समरस झाला होता की स्वराज्य म्हणजे शिवाजी आणि शिवाजी म्हणजे स्वराज्य, अशा एकतान स्थितीला कोणती आणि कसली परिस्थिती पायबंद लाऊन पालथी पाडणार.
जेथे बहुत विचार । तेथें ईश्वरावतार ।
झाले आहेत पुढें होणार । देणें ईश्वराचे ।।
केवळ विचार एकाग्र झाले म्हणजे पुरुषार्थी पराक्रमाचा मार्ग मोकळा होत नाही. विचारांची शुद्धी ठरवायला तसेच काहीतरी सर्वसमर्थ पाठबळ पाहिजे. किंबहुना त्याशिवाय विचारांची एकाग्रताच साधणे शक्य नाही. शुद्ध विचारांना लागणारे पाठबळ हे `देणे ईश्वराचे` आहे. हे ईश्वरी देणे मिळविण्यासाठी नुसती विचारांची कमावणी किंवा आचारांची डुक्करमुसंडी फुकट आहे. त्यासाठी अंतरीचा ज्ञानदिवाच प्रदिप्त करून, त्याच्या प्रकाशात आपल्या विचारांची शुद्धाशुद्धता पारखून, शिवाय अवघ्या विश्वाचे नियंत्रण करणाऱ्या ईश्वरी सूत्राची ओळख करून घेतली पाहिजे.
तस्मात् विचार करावा । देव कोण तो वोळखावा
आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी ।।४-९-७
ज्या देवाने ही नानारत्नानि वसुंधरा निर्माण केली आणि नवग्रहांसह अनंत विश्वाचे जो पालन पोषण करतो. त्याचीच ओळख पटवून घेतली की मग शनि मंगळ ग्रहांच्या गुणधर्माची निराळी ओळख करून घेण्याची यातायातच उरत नाही. उदाहरणार्थ ब्रिटिश राजकारणी दगलबाज (डिप्लोमसी) ची मूळ मख्खीच एकदा चांगली ओळखली की मग गव्हर्नर व्हाईसरावादी प्रोपग्रहांच्या बन्या वाईट हालचालीच्या रोखांचा अंदाज तेव्हाच अटकळीत येतो. त्यासाठी वेगळी खटपट करावीच लागत नाही.
जेणें संसारी घातलें । आवघे ब्रह्मांड निर्माण केले ।
त्यासी नाही ओळखिले । तेचि पतित ।। ६-१-१४
खुद्दाला डावलून, त्याच्या हुजऱ्याच्या हुजऱ्याची मिंथा करीत बसणाऱ्याला कोणी ज्ञानी म्हणेल? विद्वान पुष्कळ असतात, पण ज्ञानी फार थोडे असतात. विश्वविद्यालयाच्या कडेलोटाच्या असतील नसतील त्या झाडून साऱ्या डिगऱ्या मिळाल्या म्हणजे माणूस ज्ञानी होऊ शकत नाही. फार झाले तर त्याला विद्यावान विद्वान म्हणा. पण तो ज्ञानी नव्हे. कारण-
पोट भराव्या कारणें । नाना विद्या अभ्यास करणे ।
त्यांसी ज्ञान म्हणती परी तेणे । सार्थक नव्हे ।।
देव वळिखावा एक । तोंचि ज्ञान तें सार्थक ।
येरे आवधीचि निरार्थक । पोटविद्या ।।
येवं पोट भराव्याची विद्या । तयेसि म्हणो नये सद्विद्या ।
सर्वव्यापक वस्तु सद्या । पाविजे तें ज्ञान ।।६-१-२३
ऐक ज्ञानाचें लक्षण । ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान ।
पाहावें आपणासि आपण । या नाव ज्ञान ।
मुक्य देवास जाणावें । सत्य स्वरूप ओळखावें ।
नित्यानित्य विचारावें । या नाव ज्ञान ।। ५-७-२
साहेबास लोटांगणी जावें । नीचासारिखे व्हावें ।
आणि देवास न मानावें । हें कोण ज्ञान? ।। ६-७-६९
शिवाजी महाराज विद्वान नव्हते, याबद्दल त्यांच्या निंदक वंदकांत दुमत नाही. ते विद्वान नव्हते, पण पट्टीचे ज्ञानी होते. त्यांनी `मुख्य देवास` जाणिले होते. ‘सत्य स्वरूप` ओळखून `नित्यानित्य विवेक` त्यांनी पूर्ण कमाविला होता. त्यांच्या कर्मयोगी ईश्वरी ज्ञानाच्या पाठिंब्यावर पुढे पुढे रेटला जात होता, म्हणूनच तो निष्काम घडला आणि म्हणूनच तो यशस्वी झाला. शिवरायाच्या चरित्राचा सुक्याठाक राजकारणापुरताच विचार करणाऱ्या मंडळींची दृष्टी एकाक्ष असते. अफझलखानासारख्या प्रचंड दैत्याला चुटकीसरसा चीत करणाऱ्या आणि आगऱ्याच्या बादशाही दरबारात औरंगजेबाची बेफाम निर्भत्सना करणाऱ्या शिवाजीची मनोवृत्ती ईश्वरभक्तीने किती चबचबीत भिजलेली असे, याची त्यांना कल्पना होत नाही.
“करता करविता परमेश्वर, होणे जाणे त्याच्या हाती, सुख दुःख येवो जावो, मी केवळ निमित्तमात्र, पडेल ते काम, घडेल तो मुकाबला, भेटतील ती संकटे, ह्या सर्वांना मर्दाप्रमाणे तोंड देऊन, यशापयशाचा भार `श्री` च्या चरणी वाहून, मी यथामति यथाशक्ती कर्तव्याची कमाल कसोशी करीत राहाणार" हा एकच चैतन्याचा विद्युत्प्रवाह शिवाजींच्या अखिल जीवनात अखंड सणाणत होता. मिसरूड फुटले नव्हते आणि कशास काही पत्ता नव्हता, अशा काळात सुद्धा देशपांडे दादाजी नरस प्रभूशी स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेची आणाभाक वाहताना सुद्धा तरूण शिवाजी "हे राज्य व्हावे असे
`श्रीं` च्या मनात फार आहे
असे उद्गार काढतो; `माझ्या मनात फार आहे` असल्या क्षुद्र कल्पनेचा वारा त्याच्या हृदयात शिरणेच शक्य नव्हते. कारण बाळपणासूनच तुकाराम, रामदास, जयरामस्वामी रंगनाथ मोरयादेव इत्यादी संत महंतीच्या संगतीने शिवाजीने परमेश्वरभक्तीची वात सरसावून, आपल्या हृदयात ज्ञानदीप अखंड तेवत ठेवला होता. सुखदुःखाच्या आणि लाभहानीच्या सर्व कल्पना जगन्मातेला, तुळजामातेला, समर्पण करून, आपल्या आत्मीय संकेताचा परमेश्वरी संकेताशी एकजीव करून टाकला होता. निर्गुण स्वरूपात जगन्माता तुळजाई आणि सगुणरूपात माता जिजाई यांच्या कृपेची ढाल पांघरूनच शिवाजीने अगणित प्राणघातक मुकाबल्यांच्या जबड्यात आत्मविश्वासाच्या धडाडीने उड्या घेतल्या आणि त्या ढालीच्या सर्वसमर्थ प्रभावाने शिरसलामत यशवंत होऊन शिवाजी बाहेर पडला. वास्तविक पाहिले तर शिवाजीचे सर्व आयुष्य अत्यंत दुःखपूर्ण आणि कंटकमयच होते.
ज्याला आपण प्राकृत संसारी जन `सुख` मानतो, त्याचा लवलेश सुद्धा शिवाजीला कधी चाखायला मिळाला नाही. बुद्धीची किंचित वाढ होऊन समजू लागल्या पासूनच, त्याच्या जगड्व्याळ कर्तव्याचे विराट स्वरूप त्याच्या ज्ञानचक्षूपुढे नाचू लागले. त्याच्या पूर्ततेसाठी वडिलार्जित सरदारी श्रीमंतीच्या सुखपभोगांना लाथ मारून, त्याने तारुण्याच्या उष:कालीच फकीरी पत्करली. राजकारणी क्षेत्रात प्रत्येक क्षणाला त्याचा जीव अखंड धोक्यात. अफझलखानी मुकाबले तर त्याच्या पाचवीलाच पूजलेले. कौटुंबिक अथवा संसारिक सुखाचा तपास केला तर तेथेही सगळाच खडखडाट, मरेपर्यंत कौटुंबिक सुखाने शिवाजीकडे एकदा सुद्धा चुकून कधी स्मितहास्य केले नाही. संसारिक आपत्तींना कंटाळून आपल्या कमजोर बुद्धीची धाव आत्महत्येसारख्या नामर्द मर्यादेला भिडविणाऱ्या आणि सुखदुःखाच्या फोलकट कल्पनांना आपल्या कर्तव्याचा बळी देणाऱ्या षंढांनी शिवरायाच्या चारित्र्याचा मनपूर्वक विचार अगत्य करावा.
संसारिक व्यावहारिक आणि लौकिक आपत्तीचा क्षणमात्र विचार न करता, अमीराच्या पोटी जन्मून फकीरीने राहणाऱ्या शिवाजीने जो एवढा मोठा लोकोत्तर पराक्रमांचा हिमालय उभा केला, तो केवळ एकाच सामर्थ्यावर त्याने आकाशस्थ किंवा पृथ्विस्थ छोट्यामोठ्या ग्रहोपग्रहांची पर्वा केली नाही. त्याने थेट खुद्दाच्या दरबारात धाव घेऊन, आदिमाया जगदंबेच्या पायी मिठी मारली. यशापयशाचे सुखदुःखाचे, लौकिकी अबूबेअब्रूचे, लाजलज्जेचे सारे गाठोडे त्या तुळजामातेलाच अर्पण केले. मग काय विचारावे? `भावार्थबळे जेहि भगवंतासि बोभाइले` त्याला तो श्रीहरी, ती जगदंबा, काय कधी अंतर देईल? नाही, नाही, शतशः नाही. असल्या अनन्य भक्ताने हाक मारायचीच थातड़ तों-
देव आपण घालुनि उडी । तयांसी नेले पैलथडीं ।
येरे तें अभाविके बापुडीं । वाहतचि गेली ।।
संकटी पावे भाविकाला । रक्षितसे ।।
जयास भगवंत आवडे । तयाचें देवासी सांकडे ।
संसार दुःख सकळ उडे । निजदासाचे ।। ३-१०-११
निःकाम भजनाचे फळ आगळे । सामर्थ्य चढे मर्यादे वेगळे ।
तेथें बापुडीं फळें । कोणीकडे ।।
भक्ते जे मनी धरावे । ते देवे आपणाच करावें ।
तेथे वेगळें भावावें । नलगे कदा ।।
दोनी सामर्थ्य येक होता । काळास नाटोचे सर्वथा ।
तेथे इतरांची कोण कथा । कीटकन्यायें । १०-७-२४
शिवाजीने लौकिक सर्वस्वाला लाथ मारून देवभक्ती आणि देशभक्ती यांचा असा एकजीव केला की त्यांच्या संयुक्त सामर्थ्यापुढे शनि मंगळादी ग्रहांच्या दशेचे दणके वायबार ठरले. संचितांचे भोक्तत्व म्हण, ग्रहदशा म्हणा, का व्यावहारिक आपत्ती म्हणा, वाटेल त्या प्रसंगी चित्तवृत्ति शांत आणि संतुष्ट ठेऊन, शिवाजी हव्या त्या संकटाच्या नरड्यालाच थेट जाऊन भिडत असे. `मी मेलो तर काय होईल?` याचाहि जो क्षणमात्र विचार करीत नसे, तो सुखदुःखाची आणि लाभहानीची किती दिक्कत बाळगणार?
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यासि ।।
(अर्थः सुख आणि दुःख, लाभ आणि हानी, जय आणि अपजय सारखे मानून तू युद्धास तयार हो. या रीतीने तुला कोणतीही पातक लागणार नाही.) हा योगीश्वर श्रीकृष्णाचा जीवनमंत्र शिवाजीने आपल्या चारित्र्यात अपरंपार भिनविल्यामुळेच त्याच्या पुरुषार्थी पराक्रमाला यशवंत करण्याची जबाबदारी त्या जगन्मातेला स्वतः पत्करावी लागली.
आम्ही संसारी माणसे, संसारापलीकडे आणि त्यातल्या फोलकर सुख दुःखाच्या विवंचने पलीकडे आम्हाला काहीच दिसत नाही. संकटांचा वारा जरा उलटापालट वाहू लागताच आमची तारांबळ उडते. मग आम्हाला देवाचा धावा सुचतो. नवग्रहांची शांति आठवते. तरीही टीचभर स्वार्थापलीकडे आमच्या मनाची धाव जात नाही.
देवाशी सुद्धा सौद्याची सोदेगिरी
करायला आम्हाला खंत वाटत नाही. माझी परीक्षा पास होईल तर मी सत्यनारायण करीन, बायकोला मुलगा होईल तर मी तुझ्या जत्रेला येईन. सगळ्या नवसांची यी ह्या जर-तरच्या वंगणावर चाललेली. शनीची साडेसाती सुरू झाली की मारुतीवर तेलशेंदराचा अभिषेक आणि प्रार्थना? तर `शनि देवा, मला छळू नकोस, तुला एक सोडून लाख लोटांगणे घालतो. पण माझ्या संसारातल्या चाकांचे वंगण कमी करू नकोस. ऑफिसात रिडक्शनची गडबड चालू आहे. त्यात मला डिच्चू देऊ नकोस: वगैरे वगैरे वगैरे. देवाला नवस करण्याचे इतक्या चमत्कारिक आणि विचित्र अटीचे कित्येक मामले लोकात प्रचलित आहेत, की हे ऐकले म्हणजे आम्हा स्वार्थी संसाऱ्यांच्या कीटकवत जीवनाची खरोखरच खंत येते.
देवावेगळे कोणी नाही । ऐसे बोलती सर्वही ।
परंतु त्यांची निष्ठा कांही । तैसीच नसें ।। ४-८-१९
संकटांच्या वेळीच आम्हाला देवाची आठवण व्हायची. आणि त्यात काही चूक नाही अगर वाईट नाही. संकटांमुळेच देवभजनी लागण्याची संधी आम्हाला लाभते, हे संकटांचे आमच्यावर केवढे उपकार? पण तेवढी लाट ओसरली की आम्ही पूर्वपदावर येतो, हेच काय ते वाईट.
ग्रहांचे गुणधर्म पारखले, त्याप्रमाणे आचार विचारांना शिस्त लावली, लौकिकी प्रयत्नवादी शिकस्त केली, आणि परमेश्वराला मात्र अजीबात डावलले, तर नुसता एकांडा प्रयत्नवाद कधीही यशस्वी होणार नाही. भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय नुसत्या प्रयत्नवादाची कोरडी डुक्करमुसंडी फुकट आहे. अलीकडे कोरड्या प्रयत्नवादाची महती गाऊन, हिंदी तरुणात कर्तबगारीची शिरशिरी उत्पन्न करणारी नियतकालिके व पुस्तके यांना बराच ऊत आलेला आहे. `फिरून यत्न करा` या तोडग्यात बाह्यतः कितीही जादू भरलेली दिसत असली, तरी तेवढ्या जादूच्या तुटपुंज्या भांडवलावर प्रयत्नवाद यशवंत झाल्याचे उदाहरण नाही. कावेबाजीने लोकांच्या मुंड्या मुरगाळून खाकधिशाचे लाखाधीश पुष्कळ होतात. पण हा प्रयत्नवाद म्हटला तरी तो कर्मयोग नव्हे आणि ते मुंड्यामारू लोक कर्मयोगीही नव्हेत. नुसते दगडावर दगड रचून मनोरे बांधले जात नाहीत. कोरड्या प्रयत्नांच्या परमावधीने दगडांचा मोठा थोरला डोंगर बनला तरी त्याला कोणी किल्ला म्हणणार नाही, की ताजमहालाची महति त्याला येणार नाही.
जो जो प्रयत्न रामाविण । तो तो दुःखासी कारण ।।
विश्वनाथाला विसरून केलेले प्रयत्न, लोकांच्या समजुतीने कितीही ताडमाड उंच गेले, तरी ते अखेर अल्पायूच ठरतात. गेल्या महायुद्धाच्या धामधुमीत शेकडो मानकाप्या व्यापाऱ्यांनी दहाचे हजार आणि हजारांचे लाख रुपये यक्षिणीच्या कांडी प्रमाणे मिळवून ते `श्री` मान बनले. यशवंत प्रयत्नवादी म्हणून त्यांच्या किर्तीचा नगारा झडला. श्रीमंतीच्या जोरावर ते लोकात पुण्यशील पुढारी म्हणून प्रख्यात पावले. राजकारणातही त्यांची सल्लामसलत तोळामासावर विकू लागली. कोरड्या प्रयत्नवादाचे गोडवे गाणाऱ्या कोडग्या वृत्तपत्रांनी त्यांची सचित्र चरित्रे प्रसिद्ध केली. महत्त्वाकांक्षी तरुणांचे आदर्श म्हणून त्यांच्यावर स्तुतिस्तोत्रांचा मुसळधार पाऊस कोसळविताना, ह्या `श्री`मंतांच्या करणीत `श्री` किती आणि `राम` आहे का नाही ह्याचाही कोणी विचार केला नाही. अखेर परिणाम व्हायचा तोच झाला.
परमार्थी तो राज्यधारी । परमार्थ नाही तो भिकारी ।।
हा सनातन सिद्धांतच प्रत्ययाला आला. कोरड्या ठणठणीत प्रयत्नवादी दगलबाजीचे ह्या नकली ‘श्री’मंतांचे ऐश्वर्य अवघ्या १० वर्षात कडाड कोसळून जमीनदोस्त झाले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. कित्येक फरारी झाले. कित्येक नादारी घेऊन बाई बुवांच्या मठात देवभक्तीला लागले. कित्येक तुरुंगात खडी फोडायला गेले. लक्षावधी लोकांच्या ठेवी बुडाल्यामुळे ते ह्या `कर्मयोग्यां`च्या नावानं आपल्या कर्मभोगाला शिव्याशाप देऊ लागले.
असे कां झाले? तर प्रयत्नवाद्यांच्या धडपडीत अथेति कोठे `राम`च नव्हता. आम्ही हजार चळवळी केल्या आणि लाख प्रयत्न केले, तथापि
अहो ज्यां नरां रामविश्वास नाही ।
तया पामरां बाधिजे सर्व काही ।।
हाच अनुभव अखेर घ्यावा लागतो. `सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे।` एवढे समर्थवाक्य आम्हाला चांगले पाठ येते. परंतु `परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।` ह्या `परंतु`कडे मात्र आम्ही सपशेल पाठ फिरविलेली असते. संसारिक किंवा सार्वजनिक चळवळीतील प्रयत्नांची आम्ही कसोशीने कितीही उपासना केली, तरी अनंत ब्रह्मांडनायक श्रीरामाच्या उपासनेशिवाय त्या चळवळीत `राम` उत्पन्न होणार कसा? परमेश्वराच्या
उपासनेचा मोठा आश्रयो । उपासनेविण निराश्रयो ।
उदंड केले तरी तो जयो । प्राप्त नाही ।।
समर्थांची नाही पाठी । तयास भलताच कुटी ।
या कारणे उठाउठी । भजन करावें ।। १६-१०
जबरदस्त पाठिंबा असल्याशिवाय कोणतेही कार्य यशवंत होऊन चिरकाल टिकत नाही. परमेश्वराशिवाय असला जबरदस्त पाठिंबा कोण मानवाची लंडी देणार? राजे महाराजे कोणीही कितीहि असले, तरी तेच स्वतः जेथे मलमूत्रजन्य मरणाधीन माणसे, तेथे त्यांचा `आश्रय` काय किंमतीचा मानायचा? त्यांच्यावरही दशेचा वरवंटा फिरला की त्यांचीही हाडके भर होळीपौर्णिमेच्या होळीत कशी कडाकड उफलतात, याचे प्रत्यंतर होळकरांच्या होळीने नुकतेच सर्वांच्या नजरेला पडलेले आहे. तुकोजीराव होळकरात जर काही `राम` असता, तर त्याला आपल्या सिंहासनालान रामराम ठोकण्याची पाळीच आली नसती. ही पाळी टाळण्यासाठी त्याने प्रयत्नांचे विंध्याद्री उलथे पालथे केले. न भूतो न भविष्यति डावपेच लढविले. संपत्तीचा डोळेफाट होम केला. भटांच्या आर्शिवादासाठी त्यांना पोटफाट मेजवान्या दिल्या. पण त्याला `समर्थांची पाठी`च नसल्यामुळे त्याला `भलताच येऊनी कुठून` गेला.
आपुले आवघेचि जावें । परी देवासी सख्य राहावे ।
ऐसी प्रीती जीवें भावे । भगवंती लागावी ।।
देव म्हणिजे आपुला प्राण । प्राणांसी न करावें निर्वाण ।
परम प्रीतीचे लक्षण । ते हें ऐसें असे ।।
ऐसें परम सख्य धरितां । देवास लागे भक्ताची चिंता ।
पांडव लाखजोहरी जळतां । विवरद्वारे काढिले ।। ४-८-११
सर्व कर्मे निष्काम बुद्धीने `कृष्णार्पण` करून, निश्चयी विवेकाने विहित कर्तव्य बजावणाऱ्या भक्तावर प्रत्यक्ष कृतांतकाळ कोपला, तरीही त्या भक्ताचा रोमसुद्धा वाकडा होऊ शकणार नाही; मग या आलतू फालतू शनि मंगळादी ग्रहांच्या दशांचा मगदूर काय?
देवे भक्त कोण वधिला । कधीं देखिला ना ऐकला ।
शरणांगतांस देव झाला । वज्रपंजरू ।। ४-८-२५
`समर्थांची पाठी` नसता केलेला एकांडा प्रयत्नवाद देखता देखत मातीत कसा मिळतो, याचा दाखला नेपोलियन बोनापार्टाच्या चरित्रात उत्तम मिळतो. तो उत्तम ज्योतिषी व खगोलज्ञ होता. नवग्रहांचे गुणधर्म तो यथातथ्य जाणत असे. ज्योतिषशास्त्राच्या सहाय्याने मोहिमांचे लष्करी डावपेच तो इतक्या अचाट निपुणतेने ठरवीत असे की ठरल्या मिनिटाला विजयश्री धावत येऊन विजयाची माळ त्याच्या गळ्यात घालीत असे. नेपोलियनने आकाशस्थ नवग्रहांच्या दशांना आपल्या इतक्या हुकमतीत आणलेले होते की त्याच्या मुहूर्ताचा ठोकताळा, वॉटरलूच्या अधःपातापूर्वी एकदा सुद्धा कधी हुकला नाही. त्याचा निरीक्षरी एकांडा प्रयत्नवाद समुद्राच्या भरती प्रमाणे एकसारखा बेफाम फोफावतच गेला. तथापि एक श्रीहरीची कृपाच काय ती अमर्याद, बाकी सर्व गोष्टींना मर्यादा आहेत, याचे त्याला भानच राहिले नाही.
नेपोलियनचा प्रयत्नवाद कळसाला पोहचला असेल नसेल तोच वॉटर्लूच्या समरांगणावर त्याची मर्यादा संपून तो धडाड खाली कोसळला. प्रयत्नवादाचा किल्ला उभारण्यासाठी त्याला सारी हयात खर्ची घालावी लागली, पण तो कोलमडून ढासळायला एक मिनिट पुरून उरले. साऱ्या युरोप खंडाला आपल्या तलवारीच्या जरबेत ठेवणारा हा द्वितीय राज्यक्रांतिकारक अखेर कुत्र्याच्या मोताने मेला. नवग्रहांशी एकतान झालेला हा ज्योतिर्विद पुरुषोत्तम इंग्रजांच्या सेंट हेलेना बेटातल्या तुरुंगात सडत पडत असता, एकाही गुरु, बुधाला किंवा रवि, चंद्राला त्याच्या धावण्याला धावता आले नाही. सेंट हेलेनाला जाताना तो म्हणाला `मी स्वपराक्रमाने रंकाचा राव झालो, नराचा नरपति झालो. आज माझ्या दैवाने गोता दिला, त्याला दैव आठवलं पण देव चुकूनसुद्धा आठवला नाही.`
आता शिवाजी महाराजांच्या चारित्र्याकडे पाहा. हिंदवी स्वराज्य प्राप्तीसाठी प्रयत्नाचे पाऊल उचलण्यापूर्वीच त्यांनी प्रथम भगवंताचे अधिष्ठान शोधले. देवावर भार घातला. आदिमाया जगदंबेच्या चरणी सुखदुःख, यशापयश आणि लाभ हानीचे गाठोडे वाहिले, साधुसंताचे आशीर्वाद घेतले आणि केवळ निष्काम वृत्तीने पडेल त्या मुकाबल्याच्या छातीवर तो चालून गेला. शिवाजीने आपल्या प्रयत्नवादाला भक्तिपूर्ण ज्ञानयोगाची जोड देऊन गीतोक्त कर्मयोगाची तपश्चर्या निष्काम बुद्धीने आचारली. म्हणूनच शिवाजीचा प्रयत्नवाद यशवंत होऊन चिरंजीव झाला. `स्वराज्य प्राप्तीच्या दिशेने पडेल ते कार्य आणि भेटेल ते साहस कुशलतेने तडीला न्यायचे एवढेच माझे काम. यशापयशाची काळजी तुळजामातेला.` इतक्या वृत्तीला गेलेल्या योग्याकडे काळसुद्धा वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. मग कोण कोठला अफझुलखान आणि कोणत्या झाडाचा पाला अवरंगझेब!
सर्व भार देवावर टाकला म्हणजे आपण आपल्या कर्तव्याच्या बऱ्यावाईट जोजारातून मोकळे होतो, असे मुळीच नव्हे. देवावर भार घाला वा नका घालू. कर्तव्याला पाठ दाखविणे नामर्दाशिवाय कोणालाच शोभणार नाही. `कर्मण्येवाधिकारस्ते.` तुझे जे विहित कर्तव्य असेल ते इमाने इतबारे आणि विशेषतः अत्यंत कुशलतेने बजावणे, हाच तुझा अधिकार. त्याला गोड फळ येईल का कडू येईल, का मुळीच येणार नाही, ह्याच्या यातायातीत तू पडू कोस. तुझ्या कर्तव्याचा मार्ग सरळ असो वाकडा असो वा आवडीचा असे वा नावडीचा असो सुखाचा असो वा दुःखाचा असो, तो तुला निष्ठेने आणि निश्चयाने चोखाळलाच पाहिजे. आंगचुकारपणा चालणार नाही. संकटांच्या आणि आपत्तीच्या सावलीने भेदरण्यात पुरुषार्थ नाही. ते हिजड्याचे नामर्दाचे लक्षण. स्वार्थबुद्धीला लवमात्र थारा न देता तू कर्तव्यनिष्ठेने कर्तव्याची शिकस्त कर, म्हणजे तुला माझी निराळी उपासना करायला नको. हाच श्रीकृष्ण योगेश्वराचा अखिल मानवाना कर्मयोगाचा संदेश आहे.
शेकडा शंभर लोकांना आधी मुळी कसले ध्येयच नसते, मग कर्तव्याची दिशा कशी उमगणार? निरक्षर अडाण्याची गोष्ट सोडली, तरी युनिवर्सिटीच्या ज्ञानयोगात मुरंब्याप्रमाणे मुरलेल्या पदवीधरांच्या ठिकाणी सुद्धा ध्येयाचा आणि कर्तव्य कल्पनेचा खडखडाटच आढळून येतो. बी.ए. का झालास? तर मॅट्रिकची ट्रिक साधली म्हणून. पुढे काय करणार? ते काही ठरले नाही अजून पण मास्तरकीची नोकरी मिळाली तर लॉट भरून एलएल.बीचा किंवा एम.ए.चा प्रयत्न करीन. बरे, पुढे काय? ते आज काही सांगता येत नाही, असल्या मुर्दाडांकडून कोणी कसल्या कर्तबगारीची अपेक्षा करावी? शाब्दिक ज्ञानाच्या पोपटपंचीपलीकडे जवळ भांडवल नसलेल्या या शब्दशूरांना जेथे कर्तव्यच उमगत नाही तेथे कर्तव्यनिष्ठा तरी साधणार कशी? आणि कर्तव्यनिष्ठेची फुरफुरी चुकून आलीच, तर तिच्या साचनक्रमात अवश्यमेव भेटणाऱ्या आपत्तीना आणि संकटांना हे एकांडे ज्ञानशिलेदार कोणत्या शक्तीच्या जोरावर तोड देऊ शकणार? पुस्तकी शब्दज्ञान चिकित्सेची वटवट करायला उपयोगी पडले, तरी लोकव्यवहारांच्या धकाधकीच्या मामल्यात टिकाव धरताना त्याचे तीनतेरा उडतात.
ज्ञान कितीही डोळस असले तरी त्याची एकांडी मुसंडी काहीच कार्य घडवू शकणार नाही. ज्ञानाला जेव्हा ईश्वरभक्तीचा पाठिंबा द्यावा, तेव्हा कोठे त्याच्या डोळसपणाला खरी धार लागते, आणि तेव्हाच मनुष्य कर्तव्याच्या क्षेत्रात निष्काम कर्मयोग आचरण्यास अधिकारी होतो. भक्ती ज्ञान आणि कर्म हे तीन योग कितीही सामर्थ्यवान असले, तरी त्या प्रत्येकाची एकांडी शक्ती फुकट आहे. तिघांना जेव्हा समरशी समन्वय होईल, तेव्हाच खरे सामर्थ्य चमकू लागेल. एरवी नाही. ज्ञानाशिवाय भक्तीमार्गी कितीही टाळ ठोकीत बसला तरी फुकट. रामनामाची कोट्यावधि जपणी केली तरी
रामनाम सब कुहि कहे ठक ठाकुर और चोर ।
जिस नामसे ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुच और ।।
मनुष्य कितीही ज्ञानी झाला, तरी त्याचे हृदय जर भक्तिशून्य असेल, तर त्याच्या पांडित्य-दीपाची अवस्था तैलशून्य दिव्याप्रमाणेच व्हायची आणि भक्तीयुक्त ज्ञानाशिवाय कर्मयोग कोणी आचारू म्हणेल, तर तेथे त्याला
उंदराच्या पिल्लाने सापळ्याचे खेळ
खेळल्याचा अनुभव भोगावा लागेल. पण आमचा सर्व व्यवहार पहावा तो एकाक्ष आणि एकांड्या. जे भक्तीमार्गाला लागतात ते नुसते टाळ कुटीत बसतात.
जे ज्ञानमार्गाला जातात ते तेथेच वाक्यपांडित्यात गर्क राहतात. शब्द कौशल्याच्या पंखाने त्यांचे मन साऱ्या त्रिभुवनाची यात्रा करते, पण अंत:करण भक्तीच्या अभावी स्नेहशून्य ताठरच असल्यामुळे, त्यांना कित्येक गूढ प्रमेयांचे उलगडे झाले नाहीत, म्हणजे ते नास्तिक किंवा संशयी बनण्यातच आपल्या ज्ञानाचा कळस झालासे मानतात. याच्यापुढे मात्र त्यांचा रस्ता बंद! (*“There are many things in heaven and on earth, Horatio`s, than are dreamt of in your philosophy" -Hamlet.) भक्ती आणि ज्ञान डावलून जे कोणी कोरड्या प्रयत्नवादाच्या भरी पडतात, ते दगडावर दगड रचून केवळ हमाली वृत्तीने ताजमहाल बांधण्याचा मरे मरे तो अट्टाहास करतात, परंतु संकटाचा एखादा फटका बसला रे बसला की देवाला नाहीतर दैवाला दोष देत मटकन कायमचे खाली बसतात.
कित्येक वाचक असे म्हणतील की, हे भक्ती-ज्ञान-कर्म-योगांचे त्रांगडे आमच्या विचारांना पुष्कळ पटेल, पण आमच्या हातून ते आचारात वठले तर पाहिजे ना! आम्ही साधीसुधी संसारी माणसे. केवळ पोटार्थी प्राणी, विक्रमी पुरुषांच्या, ज्ञानयोगांच्या न् कर्मयोगांच्या गोष्टी आम्हा अज्ञजनाना काय होत? आमच्या सारखा माणूस विपरीत ग्रहदशेच्या अथवा साडेसातीच्या तडाक्यात सापडला, तर त्याने त्या आपत्ती टाळण्यासाठी, निदान त्या सौम्य करण्यासाठी काय करावे? अपायाला काही उपाय आहे का नाही?
उपाय आहे. पण तो गुळखोबऱ्या सारखा बाजारात मिळणारा मात्र नाही. जसे संचित तसे भोक्तृत्व. ते भोगल्याशिवाय पांडवासारख्या पुरुषोत्तमांची सुटका झाली नाही, मग तुम्ही आम्ही धडापासरी माणसे कोणत्या झाडाचा पाला? दुःखात सुख एवढेच आहे की
विक्रमालाच साडेसाती विशेष भोवते
ये रे दिवसा आणि भर रे पोटा, अशा वृत्तीच्या संसारी लोकात जर विक्रमाचाच खडखडाट, तर तेथे शनिची साडेसाती तरी काय करणार एवढा मोठा गडगडाट? काहीच नाही. मग या संसारी जनाना इतके भिण्याचे कारण विक्रम असेल तेथेच शनीच्या साडेसातीचा बॉम्ब विशेष जोराने उफलणार. आसेतुहिमाचल हिंदुस्थान पंजाब आणि बंगालकडे हे साडेसात्ये सुरुंग विशेष दणक्याने फुटत आहेत. कुप्रसिद्ध ओडवायरशाहीच्या अमदानीत पंजाबातल्या एकूण एक लोकनेत्यांची मान फासावर लटकू पहात होती. पंजाबची कहाणी केव्हाही स्मरणात आणा, विक्रम हरिचंद्राच्या कहाण्या तिच्यापुढे फिक्या पडतात. बंगालची उदयोन्मुख निवडक तरूण पिढी तर आज जिवंतपणी मृत्युचा अनुभव घेत तुरुंगात कुझत पडली आहे. इतर सर्व प्रांतापेक्षा या दोन प्रांतांवरच ग्रहदशेची एवढी करडी नजर का? तर
खरा विक्रम बंगाल पंजाब मध्येच आहे
बाकीचे सारे प्रांत शुद्ध संसारी आहेत. बंगाल, पंजाबच्या मानाने त्यांच्या आपत्त्या म्हणजे दर्या में खसखस होत. तात्पर्य, जेथे काही विक्रमच नाही, तेथे सामान्य संसारी माणसाला शनीच्या आग्यावेताळ साडेसातीची हवेत खाण्याचीही जरूर नाही. पट्टीच्या शिकाऱ्याप्रमाणे शनी सुद्धा वाघ-सिंहाशीच झोंबी खेळण्याचा शोकी आहे, शेळ्या, मेंढया बोकडांची तो कशाला पर्वा करील? एवढी गोष्ट खरी की शनीने जरी सहज लीलेने कोदण्डाचा टणत्कार केला, तरी मानवी बोकडांचे कळपच्या कळप भीतीने उघळून दाही दिशा पळतात आणि त्यांच्या मानाने ही सुद्धा एक भयंकर आपत्तीच होय. तर या आपत्तीवर काही तरी तोडगा आहे की नाही? पूर्वजन्मार्जित संचिताप्रमाणे भोक्तृत्वाची अंमलबजावणी करायला निसर्गचर्म बेमुर्वत तर खराच; पण त्या पारव्याचे हंटरचे तडाखे थोडे सौम्य सफाईत खाण्याइतकी अक्कल कोठे आणि कशी मिळवावी?
भवितव्यता कोणाला कळत नाही आणि टाळता येत नाही. ज्योतिषी जर उत्तम शास्त्र असेल तर ग्रहदशेच्या परिणामांची भावी अटकळ चांगलीच करून देतो. त्या प्रमाणे जर आपण आपल्या आचारविचारांत योग्य तो बदल केला, तर भवितव्यतेचा वज्रप्रहार टाळता आला नाही, तरी छातीवर मर्दाप्रमाणे खास झेलून धरता येणे अगदी शक्य आहे. अपायाला उपाय हा असायचाच. फक्त योजनेचे कौशल्य चालविणारा योजक मात्र पाहिजे. डोक्यावर छत्र्या आणि पायात जोडे वाहणा घालून, उन्हाचा कडाका आणि मुसळधार पावसाचा धडाका आम्हाला ज्या योजन- कौशल्याने जितका टाळता येतो, तसल्याच काहीतरी कौशल्याने आम्हाला सगळ्या ग्रहांच्या दशेचे परिणाम खात्रीने तितक्या सफाईत टाळता येणे सहज शक्य आहे.
ग्रहदशेला तोंड देण्याचे मार्ग दोन आहेत. त्यांच्याशी कुशलतेने मैत्री जोडावी, किंवा उघड विरोधाचे शत्रुत्व जोडावे. पहिला मार्ग नेपोलियनने पत्करला आणि दुसरा मार्ग रामदास स्वामीनी चोखाळला. हे दोनही मार्ग सामान्य संसाऱ्याला साधणे कठीण आहे. तथापि त्यांची माहिती देणे जरूर आहे. मैत्री जोडायची म्हणजे त्या ग्रहाच्या गुणधर्माची नीट स्पष्ट ओळख करून घेऊन, त्याच्या गुणधर्माशी आपल्या आचार विचारांची बिनचुक जुळणी करून घ्यायची. उदाहरणार्थ सूर्य घ्या. अंगी प्रकाश, उष्णता असणे हा त्याचा गुणधर्म आहे. एप्रिल मे आणि ऑक्टोबर मध्ये उन्हाळा कडक असतो. एरवी तितका नसतो. खानदेश वऱ्हाड मध्यप्रांताकडे हे उन्हाळ्याचे प्रमाण अतिशय भयंकर असते. तिकडच्या रहिवाश्यांना ह्या उन्हाळ्याच्या प्रखरतेची चांगलीच जाणीव असल्यामुळे, त्यांची घरे धाब्याची असतात. कित्येकात तळघरेही केलेली असतात. उन्हाळा किती का कडक असेना, खानदेशी `भाऊ`च्या डोक्यात पागोटे आणि कानशीळ झाकणारी उपरण्याची घट्ट टापशी क्षणमात्र दूर होत नाही. कारण, असला काही बंदोबस्त केला नाही, तर आपल्याला खाडकन सन्स्ट्रोक होऊन राम म्हणण्याची वेळ येईल, हे त्याला माहित असते.
खानदेशी उन्हाळ्याची माहिती नसलेला, एखादा कोकणपट्टीचा रहिवाशी कामानिमित्त तिकडे गेला, तर त्याच्या अज्ञानाबद्दल सन्स्ट्रोकचे प्रायश्चित त्याला भोगावे लागते, अथवा तो उन्हाळा अंगवळणी येतो. परंतु खुद्द खानदेश वऱ्हाडातले लोक खुशाल आपापले व्यवहार बिनधोक चालवीत असतात. त्यांना त्या उन्हाळ्याचे काहीच वाटत नाही. कारण त्यांनी सूर्याच्या गुणधर्माशी आपल्या राहणीचे आणि वागणुकीचे तंत्र जुळते घेतलेले असते. कोकण्या प्राण्याला त्या प्रखर गुणधर्माची सलामी जन्मात पहिलीच किंवा अपरिचित असल्यामुळे, तो एक सारखा ठणाण तडफडत असतो. याच नियमाप्रमाणे शनीच्या गुणधर्माचे नीट ज्ञान करून घेऊन, त्याच्या साडेसातीच्या इंटरच्या तडाक्यांचा आपल्या जीवनशुद्धीत किती कुशलतेने सदुपयोग करून घेता येईल, याची अटकळ बांधून, आपण आपल्या कर्तव्याची दिशा जर नीट दक्षतेने ठरविली, तर शनीच्या साडेसातीचे दणके टाळता आले नाहीत, तरी खात्रीने बरेच सौम्य करता येतील.
नेपोलियन बोनापार्टने हा मार्ग पत्करला होता. स्वत: उत्तम खगोलज्ञ असल्यामुळे, ग्रहांच्या अनुकूल हालचालीप्रमाणे तो आपल्या सर्व राजकारणाची आणि मोहिमांची सूत्रे हालवून हातखंड यशवंत होऊ असे. पण किती झाला तरी नेपोलियन माणूसच. त्याच्या महत्त्वाकांक्षेने एकदम उचल खाल्ली. नवग्रहांशी मैत्रीने वागत वागत त्यांच्या दशेवरही कुरघोडी करण्याची त्याला अवदशा सुचली. वॉटर्लूच्या दिवशी सांयकाळी ५ वाजता अमूक ग्रहांची प्रतिकूल युति होऊन त्यात आपला कायमचा अधःपात होण्याचा संभव आहे, हे त्याला माहीत होते. पण लष्करी डावपेचांच्या जोरावर ग्रहयुति होण्याच्या आधीच, इंग्रज आणि जर्मन सैन्यांचा फडशा पाडून विजय मिळविण्याचा व्यूह त्याने रचला. सर्व हयातीत अखंड यशवंत होत गेल्यामुळे त्याने आत्मविश्वासाच्या जोरावर ब्रांच्या दशेला पायबंद लावण्याची प्रतिज्ञा केली. "उद्या सांयकाळी ५ वाजता घातवेळ आहे. ठीक आहे. पहाटे ५ वाजता इंग्रजी सैन्यावर तुटून पडून सकाळी १० वाजेपर्यंत त्यांचा धुव्वा उडवितो. जर्मन जनरल ब्लुशर १२ वाजेपर्यंत येऊच शकत नाही. तो येण्यापूर्वीच
इंग्रेज गब्रूंची गठडी वळली
की त्या एकट्याला दुपारी २च्या आत पाणी पाजून मी मोकळा होतो. असा ठाकठीक बेत नेपोलियनने ठरवून, त्याप्रमाणे सैनिकांना त्याच्या ऑर्डरी सुटल्या. काय वाटेल ते झाले तरी जर्मन आणि इंग्रेज सैन्याची गट्टी पडून द्यायची नाही; एकेकाला वेगवेगळे ठेचून काढायचे; आणि ते सुद्धा त्या घातघटकेच्या आधी चांगले तीन तास, हा बेत नक्की झाला. आता पहाटेच्या पाचाचा ठोका पडला की एकदम तोफखान्याचे खटारे खड़ाड़ खडाड मोर्च्या मोर्च्याच्या जागी धावत जायचे आणि यांनी एकदम इंग्रजी सैन्यावर अग्निवर्षाव करायचा. पण नेपोलियनी सूत्र ईश्वरी सूत्राशी थोडेच जुळते होते! हा विषयच त्याच्या गावी नव्हता!
ते दिवस कडकडीत उन्हाळ्याचे. सारी समरभूमी सुकीठाक आणि ठणठणीत. लष्करी हालचालीला कसलाच अडथळा नव्हता. पहाट होऊन पाच वाजले की नेपोलियनच्या लष्कराचे आणि तोफखान्याचे शाकरी तांडव नृत्य सुरू होणार. पण
इतुक्यात काय वर्तली माव?
चार वाजले असतील नसतील तोच आकाशात मेघांचा गडगडाट उठून धूमधार पाऊस कोसळू लागला. केवळ पूर्वसंचिताच्या जोरावर रंकाचा राव बनून हुकमी यशःसिद्धी मिळविणाऱ्या नेपोलियनच्या मानवी महत्त्वाकांक्षेचा गगनचुंबी मनोरा आज ढासळून कायमचा जमीनदोस्त होणार, म्हणून निसर्ग सुद्धा मुसळधार आसवे गाळू लागला. सुक्याठाक युद्धभूमीवर वीतवीतभर चिखलाचा खच पडला. पाऊस फक्त अर्धातासच पडला, पण त्याने नेपोलियनच्या सर्व कारकिर्दीवर अखेरचे पाणी पाडले. पहाटे पाच वाजता त्याच्या सैन्याची हालचाल सुरू झाली. पण चिखलातून तोफखान्याचे खटारे रेटीत नेतानाच सकाळचे दहा वाजले. वेळाचे प्रमाण हुकताच सारा डावच हुकला. नेपोलियनची दिरंगाई शत्रूच्या आयतीच पथ्यावर पडली.
जनरल ब्लूशर आणि ड्यूक ऑफ वेलिंग्टन यांच्या सैन्याची गट्टी जुळली आणि दोघांच्या जोडगोळीने अगदी ठरल्या घातघटकेला नेपोलियनच्या चरित्राची इतिश्री केली! ग्रहांच्या दशेला जाणूनबुजून चकविण्याच्या हमरीतुमरीतच नेपोलियन स्वतः चुकला आणि अखेर ईश्वरी सामर्थ्यापुढे मानवी सामर्थ्य किती लंगडे पडले, याचा विचार करता करताच चकित झाला. `जो जो प्रयत्न रामाविण! तो तो दुःखाशी कारण` हेच त्याच्या प्रत्ययाला आले. नेपोलियनात सर्व शक्ती सामावलेल्या होत्या, पण त्याच्यात ‘राम` मात्र मुळीच नव्हता. म्हणूनच नवग्रहांशी त्यांने कितीही दोस्ती जोडून साऱ्या जगाशी कुस्ती मारण्याचा चंग बांधला तरी ईश्वरी नेमापुढे त्याला अखेर डोळे उघडे ठेवून `राम` म्हणण्याची पाळी आलीच.
याच्या उलट रामदास स्वामींचे उदाहरण पहा. त्यांनी नवग्रहांशी मैत्री न जोडता, जवळजवळ त्यांचा धि:कारच केला. शनि खवळला आणि राहू चवताळला, तर काय होणार? संसाराचा चिवडाच ना? आम्हाला हा असला फुटका तुटका संसारच नको.
शय्या भूमितलं दिशोऽपि वसनं ज्ञानमृतं भोजनम् ।
असल्या वैराग्यशीलाचे हे नवग्रह काय वाकडे करणार? आपत्तींची आणि संकटांची भीतीच ज्यांनी भयाने भेदरवून उधळून दिली, त्यांना या जगात कशाचे भय? संकटे आली तर येवोत, गेली तर जावोत, मेली तर मरोत, कशाचेच सुहेर सुतक ह्यांना नाही. रामदासांनी स्वतः पुरता चूलचौक्याचा संसार जरी केला नाही तरी एवढ्या बेदरकार उदासीनतेने अवघ्या महाराष्ट्राचा राष्ट्रसंसार चालवून दाखविला, तो कशाच्या जोरावर? काही तरी जबरदस्त पाठबळ असल्याशिवाय ते नवग्रहांच्या दशांकडे इतक्या धि:काराच्या धिटाईने कसे पाहू शकले? शनि मंगळादि घुंगुरट्यांचीच कथा काय, पण `या सर्व भूमंडळावर माझ्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची छाती आहे? ह्या उद्गारांच्या पाठीमागे कोणती शक्ती उभी होती? जे कार्य नेपोलियन बोनापार्टाच्या अक्षौहिणी कदरबाज लष्करी सेनेला साधले नाही, ते रामदासांनी भगव्या छाटीच्या जोरावर बोल बालता सिद्ध करून दाखविले.
त्या भगव्या छाटीत कसली शक्ती घमघमत होती? बरे, केवळ सात्त्विक शांत साधुवृत्तीचा हा परिणाम मानावा तर येशू क्रिस्त काय कमी सात्त्विक साधू होता? त्याला शत्रूंनी चुटकीसारखा चव्हाट्यावर नेऊन ठिकाण्यावर फाशी दिली. पण रामदासांकडे वाकड्या नजरेने पाहण्याची एका तरी मायच्या पुताची छाती होती काय? जेथे विक्रम तेथे साडेसाती, हा नियम सनातन मानावा, तर त्याला सुद्धा रामदासांनी लाथाडून वाटेवेगळा केला. रामदासांचा विकम इतका थोर आणि तेजाळ की ज ती शतके झाली तरी
सह्याद्रीतून अजूनहि निघतो प्रतिध्वनी त्याचा
मग शनि नाही कोठे गेला कधी रामदासांच्या राशीला? कित्येक प्रसंगी त्यांनी प्रत्यक्ष काळाला प्रतिकार करून, निसर्गाला सुद्धा "थांब बेट्या" म्हणून दम भरायला सोडला नाही, तो कशाच्या जोरावर?
त्यांनी थेट खुद्दाच्या दरबारात जाऊन, त्यांच्या कृपेचे कवच प्राप्त करून घेतले, त्यांनी समर्थ रामाची पाठ मिळविली, आणि तिच्या माहात्म्याच्या जोरावर
समार्थांचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळी कोण आहे ।
जयाची लिला वर्णिती लोक तीनी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।
अशी आत्मविश्वासाची त्रिखंडनिनादित भीमगर्जना केली. साधूश्रेष्ठ तुकाराम बुवानी संसार केला. कसा केला ते सर्वश्रुतच आहे, पण केला, सोडला नाही. त्याच्या सर्व आपत्ती शांतपणाने भोगल्या. झाला तो छळ समाधानी वृत्तीने सहन केला. का? तर त्यांनीहि थेट खुद्दाच्या दरबारातून आपल्या जीवनाची चैतन्यशक्ती मिळविलेली होती. तिच्या जोरावर ते म्हणतात,
प्रारब्ध क्रियमाण। भक्तां संचित नाही जाण ।।
अवघा देवचि झाला पाहीं । भरोनिया अंतर्बाही ।।
सत्य रज तम बाधा । नव्हे हरीभक्तांसी कदा ।
देवभक्तपण तुका म्हणे नाही भिन्न ।।
तात्पर्य, ग्रहांशी मैत्री जोडण्याचा उपसार किंवा विरोधाचा नसता संताप म्हणजे मुख्य राजा वगळून, त्याच्या मालदार, चोपदार हुजऱ्यांशी निष्कारण सलगी किंवा हुज्जत करण्याइतकेच वायफळ होय, त्यापेक्षा त्या सर्वांनी गुंडाळून ठेऊन एकदम थेट खुद्दाच्या दरबारात धाव घेतली, तर
हरिचिया भक्ता नाही भय चिंता ।
दुःख निवारिता नारायण ।।
नलगे वाहणे संसार-उद्वेग ।
जड़ो नेदी पांग देवराव ।।
असो द्यावा धीर सदा समाधान ।
आहे नारायण जवळीच ।।
तुका म्हणे माझा सखा पांडुरंग ।
व्यापियले जग तेणे एके ।।
हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.
या नंतर असा प्रश्न येतो की नास्तिक वृत्तीने किंवा अज्ञानाने शनिग्रहाच्या गुणधर्माची अटकळ झाली नाही आणि अवचित आपण शनीच्या साडेसातीच्या वावटळीत सापडलो, तर काय करायचे? आता विचार करायला अवकाश नाही. आचाराचा घरबंध सुटुन तोहि सुरुंगाप्रमाणे खडाखड उकलू लागला. चोही बाजूला एकदम अंधार कोंदाटला. बुद्धीच लंजूर पडल्यामुळे कुशलतेचा थांगहि लागणे शक्य नाही जिकडे पहावे तिकडे घनदाट काळाकुट्ट अंध:कार! पाऊल ठेवावे तेथे निसरडे. आशेने धावत जावे तेथे निराशेची थापड, अशा वेळी काय करायचे?
समजा, आपण एकटेच जंगलातून प्रवास करीत आहोत. अवचित एकदम तुफान उठले. मुसळधार पाऊस कोसळू लागला. दिशा धुंद झाल्या. सर्वत्र अंधार पडला. मोठेमोठे वृक्ष कडाड कोसळू लागले. विजांचा कडकडाट चालू झाला. अशा प्रसंगी काय करायचे? उघड्या मैदानावर श्रीहरीचे नामस्मरण करीत खुशाल फदकल मारून बसायचे, काय होईल. तुफान कितीहि भयंकर असेल, तरी ते जगाच्या अंतापर्यंत तर टिकणार नाही ना? मग उगाच धावाधाव करण्यास काय हाशिल? एखाद्या बड्या झाडाच्या बुंध्याचा आश्रम घ्यावा आणि तोच कोळमडून आमच्या टाळक्यात पडावा, त्यापेक्षा उघडे मैदान काय वाईट? खुशाल खाली मुंडी स्वस्थ बसावे. तुफान गेले की कपडे झटकावे, चांगले पिळावे, ओलेत्याने मार्ग चालू लागावे, तुफान गेल्यावर सूर्यप्रकाश येतोच, हवाहि सुधारते, कपडेहि वाळतात आणि आपणहि शिरसलामत! तुफानाला आपण विरोध तो काय करणार आणि कसा? शिर सलामत तर पगड्या पंचवीस!
`बचेंगे तो और भी लढेंगे`
हे वीर दत्ताजी शिंद्याचे चिरंजीव वाक्य अखंड नजरेपुढे ठेऊन, पडेल त्या प्रसंगाला कुशलतेने तोंड देण्यातच खरा पुरुषार्थ आहे. कुशल नावाडी वारा उलटा वहात असताना, एक तर जहाजाची शिडे उतरून लंगर टाकून ओरवा करतो, नाही तर विशेष कुशलतेने शिडेच किंचित तिरपी उभारून उलट वाऱ्यावरच सुलट ठराविक दिशेला जहाज नेतो. विवेकी बुद्धीचा, अचल निश्चयाचा आणि व्यवहार कुशलतेचा हा सगळा खेळ आहे. केवळ गणिती ठोकताळे, नास्तिक्य बुद्धी किंवा भेदरटपणा ह्यांचा कसल्याही प्रसंगी टिकाव लागणे शक्य नाही.
चालत्या गाड्याला खीळ घालणे, दौडत धावणाऱ्या कार्याला अटकाव करणे आणि आजूबाजूची सर्व परिस्थिती खाडकन् पालटून मनुष्याला एकदम एकलकोंड्या एकांतवासात नेऊन टाकणे, हे शनिग्रहाच्या दशेचे गुणधर्म आहेत. त्यांचा हेतू समजून घेतला पाहिजे. निष्कारण निसरड्या परिस्थितीवर धावाधाव करण्यात अर्थ नाही. कार्यसिद्धी तर होत नाहीच, पण तिचा काळ मात्र दुरावतो. एकांतवासाच्या काळात बेळाला दुष्काळ नसतो. त्या वेळी श्रीहरीचे नामस्मरण, भजन आणि चिंतन करावे. समर्थांच्या
दासबोधाचे मननपूर्वक पारायण करावे
त्यांचे मनाचे श्लोक मनाच्या अणुरेणूत चांगले भिनू द्यावे. हे दोन ग्रंथ साध्या संसाऱ्यापासून तो पट्टीच्या राजकारणी आणि परमहंस नरनारी पर्यंत सर्वांना कामधेनू किंवा कल्पतरू प्रमाणेच तेजदायी व फलदायी आहेत. त्यांची भक्तीपूर्वक पारायणे केली की विचारांना शांति येते, एकाग्रतेची उत्तम धार लागते आणि विशेषतः सुखदुःखाच्या लौकिकी फोलकट कल्पनांनी कोंदटलेल्या मनोमंदिरात नित्यानित्य विवेकाचा ज्ञानदीप तेजाळ प्रकाशतो. `आधी केले आणि मग सांगितले` या कीर्तीचे श्रीसमर्थ रामदास दासबोधाबद्दल आत्मविश्वासपूर्वक ग्वाही देतात की,
भक्तिचेन योगें देव । निश्चयें पावती मानव ।
ऐसा आहे अभिप्राय । ईये ग्रंथी ।।४।।
मुख्य भक्तीचा निश्चयो । शुद्ध ज्ञानाचा निश्चयो ।
आत्मस्थितीचा निश्चयो । बोलिला असे ।।५।।
नाना किंतु निवारिले । नाना संशय छेदिले ।
नाना आशंका फेडिले । नाना प्रश्न ।।१२।।
भगवद्वचनी अविश्वासे । ऐसा कोण पतित असे ।
भगवद्वाक्याविरहित नसे । बोलणे येथीचें ।।२१।।
आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे तात्काळ ।
तुटे संशयाचे मूळ । येकसरां ।। २८-१-१
संशयाचे मूळ तुटून क्रियेत पालट कशी करावी, एवढा प्रश्न दासबोध आणि मनाचे श्लोक फार कुशलतेने सोडवितात. एकांतवासाच्या एकलकोंड्या काळात हा प्रश्न आपण सोडविला तरी तो काळ कृतार्थ झाला असे समजावे. व्यवहारात आपण का घसरलो, कसे घसरलो, त्याची कारणे काय, वगैरे तपशीलाची भवति न भवति करायला दासबोधासारखा वाटाड्या किंवा ज्ञानदीप दुसरा नाही. त्याच्या प्रकाशात आपल्या हिमतीचा अंदाज घ्यावा, निळयाची कसोटी ठरवावी, ध्येयाची रूपरेषा नव्याने आखावी, आणि परिस्थितीची परीक्षा करून, पुढे पाऊल कसे टाकायचे त्याचा विचार ठरवावा. संकटांनी गांगरून जाण्यापेक्षा. त्यातील ईश्वरी संदेश शोधण्यातच माणसाची माणुसकी आणि वीरांचे वीरत्व आहे. पांडवांनी अज्ञातवासातच पुढील भारतीय युद्धाचे चैतन्य आत्मसात केले. दिल्ली आगऱ्याच्या ९ महिन्याच्या वनवासातच शिवाजीने मराठी स्वराज्यस्थापनेचे पाचपेच निश्चित ठरविले.
रुसो जपानी युद्धात जनरल टोगो सहा महिन्यापुरता ठार मेला होता. म्हणजे अज्ञातवासात राहून, बाहेर टोगो मरण पावल्याची बातमी उठविली होती. या काळात त्याने युद्धाच्या पाचपेचांचा कसून अभ्यास केला. आणि जेव्हा रशियाच्या बाल्कन फ्लीटचे मध्यवर्ति निशाणाचे जहाज तोफेच्या टापूत आले, तेव्हा त्याला एकाच शंभर मणी तोफेच्या गोळ्याचा दणका देऊन पालथे पाडले. रशियन लोक जपानी जहाजावर पहातात, तो तेथे जनरल टोगो कृतांत काळासारखा ताठ उभा! मेलेला टोगो जिवंत झाला आणि रशियाच्या उरावर बसला.
आईच्या गर्भात असतानाच जर आमच्या मानेभोवती नाळाचा वेढा घट्ट पडलेला असतो, तर आमच्या जन्मानंतर तो मृत्यूच्या क्षणापर्यंत म्हणजे मृत्यूचा फास पडेपर्यंत परिस्थितीचे शेकडो फास आमच्या गळ्याला लागले, तर त्यात विशेष नवल कशाचे? मनुष्य म्हणजे एक प्रकारचा फासेपारधीच म्हटला तरी चालेल. जन्म झाल्याबरोबर नाळाचा फास आई तोडते. पुढच्या आयुष्यातले पास आपले आपण सोडले तोडले पाहिजेत. ते किती हळू आणि कुशलतेने सोडवून तोडावे, याचा धडा आपल्या प्रेमळ मातोश्रीने आपल्या जन्मकाळीच घालून दिलेला असतो. परिस्थितीचे वेढे फोडताना सुद्धा फार कुशलता वापरली पाहिजे. धडाडीही पाहिजे, पण धांगडधिंगा किंवा घिसाडघाई मात्र मुळीच चालणार नाही. आपल्या आईने आपली नाळ किती कुशलतेने कापून आपल्या गळ्याचा फास सोडविला, ह्याची अखंड स्मृति ज्याला आहे, तो परिस्थितीच्या कसल्याही पेचाच्या पचनी सहसा पडणार नाही. एवढे मात्र खरे की पुष्कळ वेळा शिवाजी सारखे मोठेमोठे धोरणी ज्ञानी महापुरूष सुद्धा वेढ्यात सापडले असता दिङ्मूढ बनतात. अशा वेळी
`वेढा फोडून बाहेर पड`
अशा अधिकारी वाणीच्या संदेशाची फार जरूर असते. सिद्दी जोहर आणि फाजलखान ह्यांच्या विजापुरी सैन्याने शिवाजीला पन्हाळा गडावर कोंडून धरले होते. त्या मुकाबल्याचा विचार करा.सतत चार महिने वेढा पडला. अवघ्या दख्खनमध्ये नवजीवनाचा धुमाकूळ घालणारा महाराष्ट्राचा नरसिंह शिवाजी मुसलमानाच्या जाळ्यात पुरा सापडला. शिवाजी सारखा दांडगा दगलबाज मुत्सद्दी, पण दिङ्मूढ होऊन, खुशाल चार महिने सगळ्या सैन्यासह गडावरच्या धान्याच्या कोठारांचा फडशा पाडीत स्वस्थ बसला. बाहेरचा वेढा पहावा तो वेळी गडाचा दगडी तट सहज फुटेल, पण वेढा फुटणे फार मुष्किल, अशी स्थिती! बरे, वेढ्यात अडकून तरी किती महिने पडणार? अशा ऐन आणीबाणीच्या प्रसंगी महाराष्ट्राची चैतन्यदेवता विद्युल्लते प्रमाणे कडाडली. जिजामातेने नेताजी पालकराबरोबर शिवरायाला आपला निर्वाणीचा दिव्य संदेश पाठवून, त्याच्या महिरलेल्या मनोवृत्तीला चैतन्याची बिजली सणाणवली. हा जिजामातेचा दिव्य संदेश काल्पनिक नव्हे, त्याला ऐतिहासिक आधार आहे. फक्त तो सूत्ररूपात असल्यामुळे मी केवळ तो स्पष्टीकरणाच्या भाषेने येथे देत आहे.
प्रत्येक मराठ्याने तो अखंड चिंतनात ठेवावा, तो संदेश असा-
"शिवबा, आज चार महिने तू पन्हाळ्यावर अडकून बसला आहेस, हे कोणत्या गावचे राजकारण? वेढे पडणारच आणि गेल्या अफझलखानाच्या मुकाबल्याप्रमाणे प्राणावरचे प्रसंगही येणारच. पण असा प्रत्येक वेढ्याला जर तू चारचार सहासहा महिने हातपाय पोटाशी आवळून स्वस्थ बसू लागलास, तर दहा जन्मात तरी स्वराज्य स्थापन होईल काय? अडविलेल्या सोंगटीने तू कितीसा डाव खेळणार? आता बितली खरी. मग जगण्या मरण्याचा प्रश्न कोठे उरतो? आणि असा सापळ्यातल्या वाघाप्रमाणे तू अडकून तरी किती दिवस बसणार? रडीला आलेला डाव खेळत बसणे हे राजकरण नव्हे. ज्याने अफझलखानासारख्या दैत्यावर चित्त्यासारखी झडप घालून एका पलकात नेस्तनाबूद केला, तोच राजा शिवाजी पन्हाळ्यावर अडकून पडावा, ही नामुष्कीची गोष्ट होय. चल ऊठ. माझा निरोप मिळताच कोडी फोड आणि बाहेर पड. मेलास तर तुझे या जन्मीचे कार्य एवढेच समजून मी समाधान मानीन आणि विजापुऱ्यांना तुडवीत तुडवीत वेढा फोडून बाहेर पडलास, तर तुझी स्वराज्य स्थापनेची लायकी विशेष ठरेल. गडावर कुजून मरण्यापेक्षा वेढ्यावर तुटून मेलास तरी माझा कुसवा धन्य झाला असे मी मानीन. चल ऊठ आणि फोड कोंडी."
शिवाजीला हा संदेश मिळताच अवघ्या २४ तासाच्या आत पन्हाळागडचा वेढा फुटला, बाजीप्रभूने घोडखिंडीची पावनखिंड केली, विशाळगडच्या मैदानावर बाजी पासलकराने तलवारीची शर्थ करून धारतीर्थी देह ठेवला आणि महाराष्ट्राचा स्वराज्यसूर्य शिवाजी पुनश्च देदीप्यमान चमकू लागला.
मृत्यू पावता जाशिल स्वर्गा समर जिंकिता साम्राज्य
ही श्रीकृष्ण भगवंताची वाणी अखेर खरी ठरली. ही वाणीच आम्हा मानवांची जिजामाता. तिचा चिरंजीव श्रीमद्भागवत गीतेच्या द्वारे अखिल भूतलावर वर्धिष्णु तेजाने अखंड चमकत आहे. परिस्थितीच्या वेढ्यात अडकलेल्या बद्धांनी त्या संदेशाचे तेज आपल्या जीवनात समरस करून घेतल्यास त्यांना अनेक पन्हाळगडाचे वेढे फोडता येतील.
कोणत्याही परिस्थितीच्या परिणामांची प्रतिकार करण्याची शक्ती आपल्यात नसली, म्हणजेच आपल्या क्लेशांची वेदना तीव्र होते. शरीरात काही विशेष तत्त्वांचा नैसर्गिक पुरवठा कमी पडला, म्हणजेच रोगांचा जोर होऊन मनुष्य आजारी पडतो. अशा वेळी वैद्य किंवा डॉक्टर रोग्याच्या देहात त्या लुप्त किंवा सुप्त नैसर्गिक तत्त्वांचा भरपूर पुरवठा करण्याची औषधयोजना तर करतातच, पण त्याबरोबरच त्या विशेष रोगाच्या जंतूंच्या नाशाचीही तजवीज करतात. थंडीने काकडलेल्या माणसाला ब्रॅन्डीचा एक डोस दिला की तो झटकन शुद्धीवर येऊन सावरतो. भयंकर उन्हाळ्याच्या दिवसात कोल्डड्रिंक आइस्क्रिम किंवा बीयर पिण्यासाठी लोक धडपडतात. शक्य ते उपाय करून अंतर्बाह्य परिस्थितीच्या प्रतिकूल परिणामांना अटकाव करण्याची मनुष्याची प्रवृत्ति निसर्गसिद्धच असते. अटकावाचे उपाय स्वतःला सुचले नाहीत, तर तो दुसऱ्याची मदत घेतो; आणि यदाकदाचित कोणी मदतगार मिळाला नाहीच, तर तडफडून मरतो.
शारीरिक क्लेशांना उपाय करणारे वैद्य, डॉक्टर व दवाखाने पुष्कळ असतात, पण मानसिक क्लेशांवर मलमपट्टी लावणारा जडीबुट्टीवाला बाजारात आढळत नाही. केवळ आजुबाजूच्या आप्तमित्रांची `सहानुभूति` क्षणमात्र उत्तेजक वाटली, तरी मानसिक दुःखांची तीव्रता कमी करण्याच्या किंवा त्या दुःखाचे मूळच नाहीस करण्याच्या कामी तिचा कसलाही उपयोग होत नाही. फार काय, पण अशा प्रसंगी आपल्या पुढ्यात पैशाची रास येऊन पडली, तरी आपल्या मानसिक क्लेशांचा अणुरेणूसुद्धा कमी होऊ शकत नाही. शिवाय, शारीरिक क्लेश पत्करले, पण मानसिक क्लेश परवडत नाहीत. जिवंतपणीच मनुष्य मृत्यूचा प्रत्यक्ष अनुभव घेतो. ग्रहदशेचे परिणाम प्रथम मनावर होतात आणि नंतर ते मनुष्याच्या व्यवहारावर उमटतात. प्रथम बुद्धी लंजूर पडते आणि मग सारा व्यवहार, सुकाणू तुटलेल्या गलबताप्रमाणे किंवा स्टियरिंग व्हील (सुकाणूचक्र) सुटलेल्या मोटारी प्रमाणे, बेफाम उलटा पालटा भटकतो. अशा वेळीच मनुष्याने आपल्या बुद्धीचे मनोवृत्तीचे चक्र नीट सांभाळून धरले पाहिजे.
तुफानात सापडलेल्या आगबोटीचा कप्तान जसा सुकाणूच्या चाकाला घट्ट पकडून, शक्य त्या धोरणाने बोट वाचविण्याचा प्राण जाईतो प्रयत्न करतो, तीच प्रयत्नांची शिकस्त मनोवृत्तीचे चक्र सांभाळण्यासाठी करणे आपल्याला प्राप्त आहे. यात जरा ढिलाई झाली की आपली जीवन-नौका रसातळाला गेलीच! पुष्कळ लोक परिस्थितीच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा भ्याड मार्ग पत्करतात. धडके इतक्या जोराने बसतात की त्यांचे दणके सहन करण्यापेक्षा मरण बरे, येथपर्यंत साधारण माणसाची स्थिती होऊन बसते. कारण ते दणके सहन करण्याची त्यांच्या अंतर्यामी प्रतिकारशक्ती नसते. प्रश्न इतकाच असतो की साडेसातीच्या दणक्यांना मला आळा घालता आला नाही प्रतिबंध करता आला नाही, तरी त्यांची आच मर्दाप्रमाणे सहन करण्याइतकी माझी आत्मशक्ती तरी मजबूत आणि खंबीर पाहिजे. मी लक्षाधीशाचा भिक्षाधीश झालो तरी मला माझ्या
हृदयाची श्रीमंती कायम राखली पाहिजे
बाह्य जगातले चैतन्य जर माझ्या उपयोगी पडेनासे झाले असेल, तर मी माझ्या आत्मिक चैतन्याचा स्फुल्लिंग विवेकाचा फुंकर मारून मारून प्रदीप्त करीन आणि त्याच्या जोरावर बाह्य चैतन्याला माझ्या आत्मबळाने कधीना कधी गदागदा हालवीन, असल्या कडव्या निश्चयी वृत्तीचा जोर आपल्या हृदयात अखंड सुणाणत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रीमंत होऊन राजवाडे बांधण्याचे काम फार सोपे आहे. पण ग्रहदशा बदलताच त्याच राजवाड्याला व श्रीमंती थाटाला रामराम ठोकून गरीबीच्या झोपडीत चटणी भाकरीच्या पत्रावळीवर हसतमुखाने येऊन बसण्याचे काम मोठे कठीण आहे. त्याला एक विशेष धैर्य लागते. एक विशेष शक्ती लागते. एक विशेष आत्मतेज लागते. त्याच्या जोरावर मनुष्य एकदा निर्भय बनला, की मग त्याच्यापुढे ग्रहदशा आणि गृहदशांची मातब्बरी चालत नाही.
भित्यापाठी ब्रह्मराक्षस
किंवा भेदरटांमागे सरकार! जो जो माणूस विशेष कायदा भीरू, तो तो सरकारच्या दडपशाहीच्या वरवंटा अधिक जोराचा! जो जो लोक अधिकाधिक शांतिप्रिय होतात, तो तो राज्यकर्त्यांच्या नाकांना गुप्तकटांची घाण अधिकाधिक येते! अशा वेळी सत्याच्या आग्रही वृत्तीने, सात्त्विक आत्मतेजाने, अंतःकरण निर्भयतेने अपरंपार फुलवून सोडले पाहिजे. ही निर्भयता, आत्मिक तेजाचा हा सात्त्विक प्रतिकार कसा कमवावा; आकाशस्थ किंवा पृथ्वीस्थ दानवी मानवी ग्रहांच्या दशेला मर्दपणाने तोंड कसे द्यावे आणि केवळ एक व्यक्तिनेच असे काय, पण अनेक व्यक्तिंनी बनलेल्या राष्ट्राने सुद्धा प्रतिकूल परिस्थितीत
आत्मिक चैतन्याची इलेक्ट्रिसिटी
अंतःकरणात थरथरवून, आत्मोद्धारातच राष्ट्रोद्वार कसा करावा, हे शिकण्याचा धडा समर्थ रामदासांनी श्रीमारुती उपासनेच्या रूपे अवघ्या महाराष्ट्राला घालून दिलेलाच आहे. वज्रांग उर्फ बजरंगबली मारुती हे दैवत राम किंवा रामायण काळ इतके प्राचीन असले तरी महाराष्ट्रात श्रीमारुती उपासनेचा संप्रदाय प्रथम स्थापन करण्याचा अग्रमान श्रीसमर्थ रामदासानींच घेतला. ती वेळच अशी होती की यच्चावत् हिंदु स्त्रीपुरुषांच्या हृदयात आत्मिक प्रतिकाराची काही तरी ज्वलज्जहाल शक्ती निर्माण केल्याशिवाय, स्वराज्य आणि स्वधर्म यांच्या पुनर्घटनेसाठी अगत्य लागणाऱ्या स्वार्थत्यागाला अवघा महाराष्ट्र एकमुखी एकसूत्री तयार होणेच कठीण होते. भक्तिमार्गी संतजनानी लोकांच्या मनोभूमिका आधीच देवभक्तीच्या एकाग्रतेने चांगल्या नांगरून कुदळून भुसभूशीत करून ठेवल्या होत्या. त्यातच समर्थ रामदासांनी आपल्या उज्ज्वल ओजस्वी आणि तडफदार अशा मारुती उपासनेचे सामर्थ्यवान बीज पेरताच, सारा महाराष्ट्र मारुतीप्रमाणे स्वराज्याचा बुभुःकार करीत खवळून उठला.
चैतन्य, तेज, शक्ति मग ती आत्मिक असो, मानसिक असो शारीरिक असो, वा कसलीही असो, त्याचा मूळ झरा मारुतीच्या तेजाळ चरित्रात आणि चारित्र्यात हटकून आढळायचाच. लहानलहान मुलामुलींपासून तो थेट वृद्ध स्त्री पुरुषांपर्यंत, प्रत्येकाला, ज्याच्या त्याच्या महत्त्वाकांक्षेप्रमाणे, स्फूर्तीची हवी ती ठिणगी, उत्साहाचा हवा वारा आणि चैतन्याची हवी ती भरारी अथवा तिरमिरी श्रीमारुतीरायाच्या चरित्राच्या अभ्यासाने आणि त्या गदापर्वतधारी बजरंग मूर्तीच्या दर्शनाने तेव्हाच प्राप्त होते. हिंदूंच्या देवविषयक कल्पनांच्या अगर भावनांच्या यादीत तेहतीस कोटी देव जरी गचडी करून घुसलेले असले, तरी त्या सर्वांवर मारुतीरायाच्या चरित्राचा महिमा एकाच बुभुःकारात बेछुत मात करतो. वीर्यशाली, बलशाली, बुद्धीशाली, भीमरूपी महारूद्र, ब्रह्मचारी, बज्रदेही, लोकनायक, जगन्नायक पुण्यशील, परतोषक, स्वयंसेवक, रामदूत, कपिदळ -सेनापति, इत्यादी इतक्या अनंत तेजाळ व स्फूर्तिदायक आंगोपांगानी मारुतीरायाचे चारित्र्य प्रज्वलित नटलेले आहे की जन्म होताच.
आरक्त देखिले डोळां । गिळिलें सूर्यमण्डळा ।।
वाढतां वाढतां वाढे । भेदिलें शून्यमण्डळा ।।
या चमत्कारातील गूढ उकलणे फारसे कठीण जात नाही. ज्याने तेजोनिधी सूर्याचेही आक्रमण केले, तो अंजनीसुत मारुती आपादमस्तक किती कोटी सूर्यप्रभेने तेजाळ असावा, याचा तेव्हाच उलगडा होतो. प्रश्न व्यक्तीच्या आत्मोन्नतीचा असो, वा राष्ट्रोन्नतीचा असो, त्यासाठी लागणाऱ्या स्फूर्तीचा शक्तीचा आणि प्रकाशाचा कित्ता (मॉडेल) म्हणून श्रीसमर्थ रामदासांनी श्रीमारुतीरायाचीच उपासना किती शुभंकरी व विजयदायिनी आहे, याचा इतिहास चिरंजीव करून ठेविला आहे. मारुतीउपासनेचे समर्थांचे स्तोत्र वाङ्मयच नुसते वाचले, तर त्याच्या प्रत्येक शब्दात अपरंपार शक्ती उसळत असलेली, आजही अनुभवाला येते. समर्थांचे सगळेच वाङ्मय अचाट सामर्थ्याने नुसते रसरसलेले आहे. त्यातील केवळ १३ ‘भीमरुपी स्तोत्रे` च मननपूर्वक वाचली तर दुःख, चिंता, निराशा, क्लेश यांचे खडाखड निर्दाळण होऊन, वाचकांचा आत्माराम अवर्णनीय उल्हासाने आणि आशावादाने बेफाम फुरफुरू लागतो. एक दोन सवयांचे नमुने पहा
रामदूत वायुसूत भीमगर्भ जुत्पती ।
जो नरांत वानरांत भक्ति प्रेम वित्पती ।
दासदक्ष स्वामिपक्ष नीजकाजसारथी ।
वीरजोर शीरजोर धक्कधिंग मारुती ।।१।।
हिंदुस्थानी सवयीचा नमुना किती गडगडाट करणार आहे, तो पहा, वाचकांनी एका दमात वाचण्याचा प्रयत्न करून पहावा, म्हणजे समर्थ काव्यातले दिव्य सामर्थ्य थोडे अनुभवास येईल.
जय हनुमंत जनक-दुहिता शुद्ध लेनेकू
गभार दौर दौर आये है । तब कंठ
गुरगुरगुरित नेत्र गरगरगरित रोम
थरथरथरित पुच्छ झारे । तब लेक
घरघरघरित बनमो दरदरदरित सीताशोक
हरत झरझरझरित बन उफारे । तब कंठे
कुचकुचकुचित इंद्रजीत चकचकचकित रावण
थकथकथकित कर नगर ज्यार ज्यार मखमखमखित
दास लियो जयतु राम मिलें तब कपि भुःभुःकोर ।।२।।
मारुतीची उपासना महाराष्ट्रात सर्वत्र रूढ आहे. विशेषतः शन्याळलेले लोक झटकून मारुतीपूजन करीत असतात. शेकडा ९५ लोक भटाभिक्षुकांच्या अडतीने मारुतीपूजन व तज्जन्य साडेसाती निवारणाचा आटारेटा करताना दिसतात. भटाला चवली पावली द्यावी, तेल शेंदराची नरोटी त्याच्या हवाली करावी, त्याने देवळात जाऊन काही पोपटपंची बडबडावी, यजमानाला अंगारा तीर्थ आणून द्यावे आणि त्याने भटजीच्या पायावर डोके घासावे, की झाली मारुती उपासना!
उपासना ज्याची त्यानेच स्वतः केली पाहिजे
भटामार्फत उपासना चालवून, त्याच्या मध्यस्थीने आपली आत्मशक्ती वाढविण्याचा उपद्व्याप, म्हणजे आपल्या बद्धकोष्ठासाठी भटजीला बालदीभर एरंडल पाजण्याइतकाच मूर्खपणा आहे. आपल्या अंतर्यामी ज्ञानदीप तर त्यासाठी भटाच्या अंतर्यामीची बिजली दिवाळी आपल्या किती उपयोग पडेल? आपल्या जन्म आणि मृत्यूची जबाबदारी पत्करायला जर कोणी वकील मध्यस्थ एजन्ट किंवा प्रॉक्झीवाला नसते तर ईश्वर पूजनाच्या बाबतीत तरी भटदलालाची मध्यस्थी कितीशी शहाणपणाची ठरेल, याचा विवेकी वाचकांनी विचार करावा. ज्याचा तो. कोण कोणासाठी वकीलपत्र घेऊन जन्मत नाही, लाखो रुपये दक्षिणा दिली तरी आपल्यासाठी एकहि भट मध्यस्थीने मरायला तयार होणार नाही. खटला झुंजविण्याचे वकीलपत्र कजेदलाल घेतो, पण अशीलाच्या ऐवजी आपण फाशी जाण्याचे साफ सकारतो. आत्मोन्नति ज्याची त्यानेच करावी लागते. देवभक्तीचा ज्ञानदीप आपला आपणच पाजळून, त्याच्या प्रकाशात अंतस्थ आत्मारामाची ओळख पटवून घेतली पाहिजे. त्यासाठी भटजीच्या संस्कृत पोपटपंचीची आवश्यकता मुळीच नाही. देवाची प्रार्थना हव्या त्या बोबड्या बोलाने करा, तो त्या बोलानेच प्रसन्न होतो.
जो विश्वंभर श्रीहरी कीटकाचे कुठकुठणेही कान देऊन ऐकतो, तो काय आमच्या वेड्यावाकड्या प्राकृत बोलांकडे लक्ष देणार नाही? लहान मुलांच्या रडण्याचाहि अर्थ चटकन उमगण्याची उपजत बुद्धी ज्या भगवंताने प्रत्येक आईला दिली आहे. ती जगजननी काय आमच्या प्रार्थना, भटांच्या मध्यस्थीशिवाय, ऐकण्यास नाखूष असेल? मुळीच नाही. ईश्वरी उपासनेची पात्रता आणि बुद्धी केवळ मनुष्यमात्रास असते, आणि पशुपक्ष्यांना नसते, असे मुळीच नाही. पशुपक्षी सुद्धा व्रते पाळतात व उपासना करतात. कित्येक पाळीव कुत्रे शनिवार किंवा सोमवार किंवा एकादशीचे उपास करताना मी पाहिले आहेत. (सुमारे ३० वर्षांपूर्वी पनवेल मुक्कामी आमच्या घरी `बच्चा` नावाचा एक कुत्रा होता. तो सोमवार पाळीत असे. त्या दिवशी तो कडकडीत उपास करीत असे. दूधभात वाढला तरी नुसता हुंगीतही नसे. सारा दिवस अंगणातल्या विरुपाक्षाच्या देवळात बसून राहायचा. संध्याकाळी कृष्णाल्या तळ्यात डुबकी मारून यायचा आणि मग खाणे खायचा. मरते वेळी तो आजारी पडला होता. मरणकाळी तो एकदम धावत विरूपाक्षाच्या देवळात गेला आणि तेथे शंकराच्या पिंडीजवळ त्याने प्राण सोडला. तो दिवसहि सोमवारच होता.)
मारुती म्हणजे शनि नव्हे
मारुतीची उपासना करणारे शन्याळलेले लोक, मारुतीला शनि कल्पून, त्याची आराधना करतात, ही त्यांची चूक आहे. एकंदर विश्वरचनेत शनीची भूमिका काय आहे, हे ९व्या प्रकरणात स्पष्ट केलेच आहे. मारुतीचे चरित्र सर्वांगानी इतके उदास आणि स्फूर्तिदायक आहे की त्याच्या तेजापुढे नवग्रहांच्या परिणामांची गठडीच वळली पाहिजे. परिस्थितीचा हिवाळा पडो, नाहीतर उन्हाळा कडको. मारुतीरायाच्या उपासनेचा ज्ञानदीप हृदयात एकदा चांगला उजळला की मनुष्य त्याचा प्रतिकार करायला पूर्ण समर्थ होतो. त्याची सहनशक्ती दुणावते निग्रह वृत्ती बळावते. आशावाद फोफावतो. वृत्ति स्थिर होते आणि बुद्धीचे कौशल्य पाणीदार बनते.
आत्मोद्वाराला आणि राष्ट्राद्वाराला अवश्य लागणाऱ्या सर्व उत्तम गुणांचे झरे मारुती-चरित्राच्या उपासनेने आणि अखंड चिंतनाने भक्ताच्या प्रकृतीत झुळझुळ वाहू लागतात. निराशा, उदासीनता खेद आत्मतिरस्कार इत्यादी मनो विकाराचे गरे मारुतीरायाच्या भुभुः कारापुढे भराभर वितळून उडून जातात. हा प्रश्न ज्याने त्याने प्रत्यक्ष अनुभवाने सोडवायचा असल्यामुळे त्यावर चर्चेची लेखनमखलाशी विशेष न केलेलीच बरी. रामदासस्वामी सारख्या अक्षरश: समर्थ रामदासांनी मारुती उपासनेचा दरवाजा सताड उघडून थेट खुद्यांच्या दरबारात जाण्याचा जो राजमार्ग मोकळा केला. त्याची विशेष माहिती सांगण्याचा, माझ्यासारख्या केवळ प्राकृत संसाऱ्याने प्रयत्न करणे, म्हणजे अधिकाराचे अक्षम्य अतिक्रमणच होय.
स्वधामासि जातां प्रभू रामराजा । हनुमंत तो ठेविला याचि काजा ।
सदां सर्वदा राम दासासि पावे । खळी गांजिता ध्यान सोडूनि धावे ।।
हा चमत्कार कसा घडून येतो. याचा अनुभव आणि आत्मविश्वास श्रीरामदास स्वामीच्या समर्थ बाह्यंयाच्या वाचन-मनन निदिध्यासानेच प्रत्येकाने कमविला पाहिजे. उपासनेच्या प्रकाशाने हृदयाकाश एकदा का स्वच्छ प्रकाशित झाले. म्हणजे
सदा चक्रवाकांसि मार्तण्ड जैसा ।
उडी घालितो संकटी स्वामि तैसा ।
हरीभक्तिचा घाव घाली निशाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।
हे प्रत्यंतर तेव्हाच पटते. समर्थांचे वाङ्मय तुफानी समुद्रासारखे आहे. त्या सर्वांचे आवगाहन जरी झाले नाही, तरी शन्याळलेल्या निराशावाद्यांनी निदान समर्थांची तेरा भीमरूपी स्तोत्रे अखंड वाचन-मनन निदिध्यासात ठेवावी, अशी मी स्वानुभवाची शिफारस करतो.
तेल शेंदराची मीमांसा
मारुतीला तेल आणि शेंदूर लावतात. तेल म्हणजे स्नेह. आमचे अंत:करण मारुतीरायांविषयी स्नेहाने-भक्तीने अपरंपार भरून, त्या स्नेहाळ भावनेचा मारुतीला वास्तविक अभिषेक करावा लागतो. शेंदराचा रंग भडक तांबडा. प्रेमाचाही रंग लालभडकच दर्शविण्यात येतो. उत्कट प्रेम आणि भक्ती यांचा संमिश्र अभिषेक मारुतीवर करून आमची उपासना झाली पाहिजे. हे सर्वांनाच शक्य नाही, म्हणून लौकिक तेल शेंदराची, सहजसाध्य व सोपी योजना प्रचारात आलेली आहे. शिवाय, तेलशेंदराने रंगलेली मूर्ती पहाणाऱ्याला उग्र भयानक आणि बलवंत अशी दिसते. अशा भीमभयानक तामसी महारुद्र बजरंगबलीचे उपासनापूर्वक अखंड चिंतन करून करून भक्ताच्या हृदयात तेच ध्यान, तेच उग्र रूप, तीच वज्रांगी धडाडी, तोच महारुद्राचा आवेश, तीच तेजाळ प्रकृति, हळूहळू विकसित होऊ लागते.
मारुतीरायाच्या अखंड उपासनेने, त्याचे दिव्य शक्तिमान चारित्र्य उपासकाच्या देहमनात बिंबू लागले. म्हणजे तो कोणत्याही प्रकारच्या आधीव्याधींच्या दणक्यांना जुमानणार नाही, किंवा परिस्थितीच्या आघातांपुढे वंगणार नाही.
`मागे पाय` मारुतीला माहीत नाही
कार्याचा निश्चय झाला की मग त्याच्या मुसंडीपुढे प्राणाची तमा नाही, मग संकटांची काय क्षिती? समर्थ रामदासांनी महाराष्ट्राला मारुती उपासनेची दीक्षा देण्यात सूक्ष्मतम दीर्घदृष्टीचे धोरण लढविले यात मुळीच शंका नाही. १७व्या शतकात महाराष्ट्र बजरंगबली बनला म्हणून त्याला स्वराज्य दिसले, आजहि महाराष्ट्राला, आणि अखिल हिंदुस्थानाला तामसी बजरंगबली बनण्याशिवाय, त्याच्या पुढचा ‘जगावे की मरावे` हा बिकट प्रश्न सुटणे शक्य नाही, सत्त्व आणि रज हे दोन गुण कितीही गोंडस व गोड असले, तरी तामसिक प्रवृत्तीचा पंगा प्रबळ पिसाळल्याशिवाय स्वार्थ सापडणार नाही आणि परमार्थ सुद्धा हाताला लागणार नाही. फार काय, पण तमाचे कोंदण्डणत्कार न करील, तर सत्व रजना सुद्धा निर्बलावस्थेत घोंगडीखाली डोके झाकून आपले प्राण सोडावे लागतील.
सात्विक आणि राजसिक प्रकृतिबद्दल हिंदुस्थानचा मोठा लौकिक आहे. या लौकिकाने हिंदूच्या हातात कसल्या मोक्षाने खापर पडले आहे, ते सांगणे नको. आता त्या लौकिकाची खातेवही कायमची बंद करून, हिंदू तरुणांनी तामसिक प्रकृतिचा विकास करण्याचे खाते उघडले पाहिजे. संसार, मंग तो एका व्यक्तीचा असो, समाजाचा असो, वा राष्ट्राचा असो, त्यात तमाचा तापट तामसीपण सणाणल्या शिवाय लौकिकी अगर दैवी आपत्तींचा प्रतिकार करण्याची हिंमत, म्हणजे आत्मशक्ती, त्याला लाभणे अशक्य आहे ह्यासाठीच समर्थांनी मारुती उपासनेचा समर्थ संप्रदायाचा विजयी नकाशा अखिल हिंदु तरुणांपुढे मराठी स्वराज्याच्या रूपाने, पसरून ठेवला आहे. `वन्दे मातरम्` सारख्या सात्विक मुळमुळीत किंचाळणीपेक्षा, जेव्हा अखिल हिंदु भारत
बजरंग बली की जय
गर्जनेच्या तेलशेंदरात आपादमस्तक रंगून निघेल, तेव्हा त्याचा आत्माराम जागृत होऊन, तो ह्या पुराणपुरुष भारताच्या जीवनक्रांतीचा गडगडाट करून, नवमन्वंतराच्या इतिहासाची पाने क्रान्तीच्या देदीप्यमन सोनेरी शाईने लिहून काढील.
ओम् क्रांति: क्रांतिः
वाचकांना आग्रहाची विनंती
आचारात प्रत्यक्ष क्रांति घडवून, अखिल महाराष्ट्राला आत्मविकासाचे सामर्थ्य प्राप्त व्हावे, या धोरणाने आपल्या विचारांना धक्का देणाऱ्या अनेक तत्त्वांची या ग्रंथात मी चर्चा केलेली आहे. वाचकांनी त्याबद्दलचे आपापले चिकित्सक विचार, अभिप्राय आणि अनुभव मला स्पष्ट व सुवाच्य लिहून कळविण्याची तसदी घ्यावी. म्हणजे दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी मी त्यांची योग्य ती बडदास्त ठेवीन.
दादर ता. १७ सप्टेंबर १९२८
-केशव सीताराम ठाकरे
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
भवाच्या भयें काय भीतोस लंडी ।
धरी रे मना धीर धाकासि सांडी ।
रघूनायक सारिखा स्वामि शीरीं ।
नुपेक्षी कदा कोपल्या दण्डधारी ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
****