सत्यशोधक भाऊराव पाटील
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
पुस्तकाविषयी
हे पुस्तक स्वतंत्रपणे प्रकाशित झालेलं नाही. हा फक्त प्रबोधन नियतकालिकात प्रकाशित झालेला लेख आहे. पण त्याचं मोल मोठमोठ्या ग्रंथापेक्षा मोठं आहे. हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचं पहिलं चरित्र आहे. कर्मवीर अण्णांचं काम महाराष्ट्रात खूप कमी लोकांना माहीत असताना प्रबोधनकारांनी हे चरित्र लिहिलंय. या चरित्रात कर्मवीरांच्या आयुष्याच्या प्रारंभीच्या काळातले महत्त्वाचे संदर्भ मिळतात.
प्रबोधनकार आणि कर्मवीर हे नातंच वेगळं होतं. कर्मवीर प्रबोधनकारांना गुरू मानत. रयत शिक्षण संस्थेचा आराखडा दादरमधील प्रबोधनच्या ऑफिसातच बनलाय. कर्मवीरांच्या आग्रहाखातरच प्रबोधनकारांनी प्रबोधनचं बस्तान साताऱ्याला हलवलं होतं. कर्मवीरांच्या कार्याला मदत करण्यासाठी प्रबोधनकारांनी साताऱ्यात मदतफेऱ्या आयोजित केल्या आणि महात्मा गांधींच्या हरिजन सेवक फंडातून मदतही मिळवून दिली.
या लेखाचं मोल लक्षात घेऊनच हा लेख एक पुस्तक म्हणून इथे स्वतंत्रपणे देत आहोत, याची वाचकांनी नोंद घ्यावी.
सचिन परब.
प्रबोधनकार डॉट कॉमचा संपादक
सत्यशोधक भाऊराव पाटील यांचा अल्प परिचय
महाराष्ट्रांत भिक्षुकशाहीची सत्ता अझून बरीच वरचढ आहे. विशेषतः लोकशिक्षणाची दोन शस्त्रे - शिक्षणसंस्था व वृत्तपत्रें - ही सर्वस्वीं भिक्षुकांच्याच हातीं जोंपर्यंत आहेत, तोंपर्यंत या सत्तेपुढे कोणाचेंहि कांहीं शहाणपण चालणार नाहीं. गेलीं २५-३० वर्षे भिक्षुकी पृत्तपत्रांनी हजारों गारगोट्या हिरे म्हणून लोकांच्या गळ्यात बांधल्या. देशभक्त राष्ट्रसेवक देवर्षि महर्षि तपस्वी वीर पीर समाजभूषण शिक्षणालंकार इत्यादि नाना प्रकारचें शेंदूर माखून त्यानीं शेकडों दगडधोंडे देव म्हणून गावोगावच्या नाक्यानाक्यांवर थापलेलें आढळतात.
या सवंग देवळ्याच्या गिरणींत शेंकडों स्वार्थी व लुच्या लोकांनी शिरकाव करून घेतला आहे व त्यावर त्यांनीं आपल्या पोटापाण्याच्या वंगणाचा प्रश्न अगदी बुळबुळीत रीतीनें कायमचा सोडविलेला आहे. गेल्या १५ वर्षांत फंडगुंडगिरी ही एक बिनचूक देशोद्धारक यक्षिणीची कांडी जोरावर झाल्यामुळे तर हजारों भिक्षुकी गांधिलमाशा मधमाशांची रूपें पांघरून या ‘राष्ट्रीय’ पोळ्यावर गांवोगांव घोंगावत असतात. भिक्षुकी वृत्तपत्रें म्हणजे वाटेल त्या क्षुद्राला कलमाच्या एकाच फटक्यानें देवकळा देणाऱ्या विश्वकर्म्याची मंदिरें बनली आहेत.
भिक्षुकी पत्रांत मेलेला कोणता माणुस ‘सार्वजनिक कामांत पडत’ नसे? गांवोगांवच्या पोराटोरांना माहीत असलेले शेकडो कुर्हाडीचे दांडे भिक्षुकी कृपेने देशाचे देशपांडे म्हणून प्रतिष्ठितपणें मिरवत आहेत. बोलून चालून भिक्षुकशाही हाच मुळीं एक भयंकर गांधिलमाशांचा पोळा! मग त्याच्या घोंगावण्यानें जनतेची दिशाभूल कां होणार नाहीं? आणि हिर्याच्या भावानें गारगोट्या कां विकल्या जाणार नाहींत?
भगवंताने देशसेवेचा ताम्रपट भिक्षुकांनाच एकट्याला दिलेला नाहीं. त्यांच्या बर्यावाईट अभिप्रायावर जगण्या मरण्याची बळजबरी सुरूं होणें शक्य नाहीं. त्यांच्या कारस्थानाला कोणी कितीहि बळी पडला, तरी तो जर अस्सल निष्ठावंत कर्मयोगी असेल, तर त्या कारस्थानानें त्याचा रोमहि वाकडा होणार नाहीं. भिक्षुकशाहीच्या हातीं शिक्षणप्रसार व वृत्तपत्रांचे प्रचंड शिंगाडे असल्यामुळें त्यांना आपल्या भिक्षुकी गुंडगिरीचा ध्वनि जबरदस्त घुमविता येतो.
परंतु तेवढ्यामुळें असें समजण्याचें मुळींच कांहीं कारण नाहीं, की महाराष्ट्रात त्यांच्या कंपूशिवाय दुसरे कोणी मितभाषी एकनिष्ठ स्वार्थत्यागी देशसेवक व जनसेवक नाहींत. आहेत, ठिकठिकाणीं निश्चयानें, एकनिष्ठेनें आपापलीं विहित कर्तव्ये मिटल्या तोंडीं करणारीं अनेक नररत्नें आहेत. तीं शोधून काढून त्यांच्या कर्तबगारीचा आणि शीलाच्या कमावणीचा परिचय विवेकी महाराष्ट्रीयांना करून देणें प्रबोधनाचें कर्तव्य आहे. भिक्षुकांना आणि त्यांच्या पायताणांचे नाल बनलेल्यांना ही रत्नें गारगोट्या वाटलीं, तर तीं त्यांच्या दृष्टीची पुण्याई समजून विवेकवादी जनांनी तिकडे दुर्लक्षच करणे श्रेयस्कर आहे.
सातारचे भाऊराव पाटील
हें नांव आजकाल भिक्षुकी कंपूंत मोठ्या अचक्यादचक्याचे झालें आहे. सातारा जिल्ह्यांतचसें काय, पण अवघ्या महाराष्ट्रांत हें नांव निघतांच ब्राम्हणेतर जनतेंत एका जोरदार चैतन्याचें वारें स्फुरण पाऊं लागते. टिळकी पुण्याईवर महाराष्ट्राच्या सर्वकारणी नेतृत्वाचें आसन फुकटफाकट पटकविणार्या नरसोपंत केळकरापासून तों थेट टिळकी कारस्थानांना बळी पडून हतप्रभ झालेल्या अच्युतराव कोल्हटकरापर्यंत असा एकहि भिक्षुक सापडणार नाहीं कीं ज्याला भाऊराव पाटिलाची कर्मयोगी कदर आणि बहुजन समाजावरील त्यांचें जिव्हाळ्याचें वजन माहीत नाहीं.
कृतज्ञतेला पारखा न झालेला असा कोणता अस्पृश्य आहे कीं जो हे नांव ऐकतांच या ‘पाटील मास्तरा’विषयीं आदरयुक्त भावनेचे आनंदाश्रू ढाळणार नाहीं. सातारा जिल्ह्यांत असा एकहि शेतकरी नाहीं कीं भाऊरावानें ज्याच्या माजघरापर्यंत प्राथमिक शिक्षणाचें लोण नेऊन पोचविलेलें नाही. ब्राम्हणेतर बहुजन-प्रबोधनाची अशी एकहि संस्था, चळवळ, परिषद, सभा, जलसा, व्याख्यानमाला, जत्रा, किंवा शाळा आढळणार नाहीं की जींत भाऊराव पाटलाचे श्रम खर्ची पडलेले नाहींत.
इतकी सर्वस्पर्शी व सर्वव्यापी चळवळ करणारी ही व्यक्ती कोण आहे, कशी आहे, कसल्या ध्येयाच्या मागें लागलेली आहे इत्यादि सर्व तपशील महाराष्ट्रापुढें मांडण्याचा मान प्रथमतः प्रबोधनालाच मिळत आहे, हें या कलमाचे भाग्य होय. भाऊरावचें चरित्र म्हणजे तरुण महाराष्ट्राला जितकें हृदयंगम तितकेंच तें आत्मप्रबोधक वाटेल, अशी आशा आहे. आमची अशी खात्री आहे कीं भाऊराव जर ब्राम्हण असते, निदान भटाळलेले असते, तर भिक्षुकशाहीनें त्यांना आजला आकाशापेक्षांहि उंच उचलून धरले असते!
घराणे आणि पूर्वसंस्कार
ऐतवडे बुद्रुक (सातारा जिल्हा) ही भाऊरावची जन्मभूमी. यांचें घराणें तेथले वतनदार पाटील. हे जैनधर्मी असून जात चतुर्थ. हे पाटील घराणें बरेंच मोठें असून यांच्या नातेवाईकांच्या शाखा उपशाखा विस्तृत पसरलेल्या आहेत. पिढ्यान् पिढ्या चालत आलेला मुख्य धंदा शेतकी. अर्थात् शेतकीशीं सहकार्यानें राहण्यास चटावलेल्या अक्षरशत्रुत्वाचाहि पगडा या ऐतवडेकर पाटलांवर बराच असे.
परंतु भाऊरावचे वडील पायगोंडा पाटील यांनीं मराठी ७ यत्तेची परीक्षा देऊन सरकारी नोकरी धरली. साक्षर होऊन सरकारी नोकरींत प्रवेश करणारे हे जैनांतील पहिलेच गृहस्थ. हल्लीं यांना २० रुपये पेनशन मिळत असते. खुद्द भाऊरावच्या वंशावळींतले दोन पूर्वज सर्वज्ञानसंपन्न व सर्वसंगपरित्याग करून जिनसेन (जैनांचे जगद्गुरू) झाले होते. कमाल स्वार्थत्यागाची, शिक्षणज्ञानाची आणि बहुजनसेवेची भाऊरावची जी प्रवृत्ति आज पूर्णत्वाने परिणत झालेली स्पष्ट दिसत आहे, तिचा उगम या पूर्व संस्कारांतच आढळून येतो. भाऊरावचें शिक्षण तासगांव, दहीवडी, विटे व कोल्हापूर वगैरे ठिकाणी मॅट्रिकपर्यंत झालेलें आहे.
विद्यार्थी दशेंतच त्यांना तालमीचा नाद लागला, व ते सर्व ठिकाणी बंडखोर विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध असत. लहान सहान हक्कासाठीं सामोपचाराचे सर्व प्रयत्न हरल्यावर गुंडगिरीची लाठी फिरवण्याचा प्रसंग आलाच, तर पहिला रामटोल्या भाऊरावचा असे. अमूक गोष्ट अन्यायी आहे एवढें त्यांना पटलें कीं त्या विरुद्ध शक्य त्या रीतीनें दंडुकेशाही चालवितांना ते कोणाचीहि व कशाचीहि दरकार बाळगीत नसत. लहानपणापासूनच त्यांना लोकसंग्रहाची मोठी आवड आणि त्यांच्या सवंगड्यांत शेतकऱ्याची व महार मांगादि अस्पृश्यांची मुलें यांचा भरणा विशेष असे. स्पृश्यास्पृश्य भेदाचा जुलमी वेदोक्तपणा त्यांनी आपल्या विद्यार्थी दशेंतच अटकळींत आणून त्याविरुद्ध शक्य तेवढा निकराचा विरोध करण्याचा उपक्रम चालू ठेवला होता. आपल्या अस्पृश्य मित्रांना सार्वजनिक विहिरीवर आणि पाणवठ्यावर लोक कां येऊन देत नाहीत, याचा बालभाऊरावला प्रथम प्रथम कांही उलगडाच होईना! पुढें खुलासा झाला कीं हिंदु धर्माची आज्ञाच तशी कडकडीत आहे.
एका विहिरीवर ते आपल्या एका अस्पृश्य मित्रासह पाणी प्यावयास गेलें. लोकांनी मित्राला मज्जाव केला भाऊराव म्हणाले ‘या विहिरीवर आम्ही दोघेहि पाणी पिणार. पिऊन देत नसला तर मी तुम्हालाहि पाणी काढूं देणार नाही.’ गोष्ट हमरी तुमरीवर आली. तालीमबाज भाऊरावनें कडाड एका हिसक्याने विहिरीचे रहाटचाक उचकून मोडले आणि दिले दूर भिरकाऊन. ‘काढा लेकाच्यानो कसे पाणी काढता तें! म्हणे आमचा हिंदुधर्म. उभा तिवाठ्यावर जाळला पाहिजे असला धर्म.’ भाऊरावचा आजचा कडवा सत्यशोधक बाणा, अल्पवयांतल्या असल्या प्रत्यक्ष सत्यशोधनांनी बनलेला आहे. सन १९०२ ते १९०८ पर्यंत इंग्रजी शिक्षणासाठी ते कोल्हापूरास जैन बोर्डिंगमध्ये राहात असत.
तेथेहि त्यांची बंडखोर प्रवृत्ति वाढत्या प्रमाणावर होती. विवेकाला ज्या गोष्टी पटायच्या नाहीत त्यांचा ठिकच्याठिकाणी निषेध करायला भाऊराव कधीच कचरत नसत. १९०६ सालापर्यंत कोल्हापूरची नेटिव जनरल लायब्ररी म्हणजे संपूर्ण भटाळलेली असे. मॅनेजिंग बॉडीत एकजात सगळे ब्रम्हपुत्र. ही गोष्ट भाऊरावच्या नजरेस यायची थातड. त्यांनी लागलीच आपल्या सवंगड्यांची सेना सज्ज करून, या भटी सवत्या सुभ्याला मोर्चे लावले व मॅ. बॉ. च्या इलेकशनाची संधी साधून गांवांत दांडगी चळवळ सुरू केली. शेकडो ब्राम्हणेतरांना लायब्ररीचे मेंबर करून, त्यांच्या बहुमताच्या जोरावर भटी सवत्या सुभ्याला कायमची मूठमाती दिली.
या प्रसंगी भाऊरावच्या बरोबरीने रामभाऊ शिंदे या तरुणाने नेटाचा हल्ला चढविण्यांत पुढाकार घेतला होता. हे आता बी.ए., एल.एल.बी. वकील होऊन सातार्यास प्रॅक्टिस करीत असतात. याच वर्षी भाऊरावला आणखी एका विवेक-अमान्य गोष्टीबद्दल बंड करावे लागले. प्रो. आण्णासाहेब लठ्ठे हे जैन बोर्डिंगचे सुपरिटेंडंट होते. एका संध्याकाळी काही मुलांना दाढ्या करण्याची लहर आली.
पण ते धर्मबाह्य कृत्य म्हणून बोर्डिंगच्या नियमा विरुद्ध होते. भाऊराव म्हणाले “असला कसला हा नियम आणि हा धर्म? सकाळी दाढी केली तर पुण्य आणि संध्याकाळी केली तर पाप? काय या पापपुण्याचा आचरट कल्पना बुवा. बस्स. प्रथम मी दाढी करणार. नरकांत गेलो तरी बेहत्तर!” भाऊरावबरोबर ५-६ मुलांनीहि दाढीविधी उरकला. सुप. लठ्ठे यांना ही गोष्ट कळतांच, त्यांनीं गुन्हेगारांना बोलाऊन त्यांची हजेरी घेतली व शिस्त मोडल्याबद्दल प्रत्येकाला चार चार आणे दंड ठोठावला. बाकीच्या सर्व मुलांनीं दंड भरला, पण भाऊरावने साफ नाकारलें.
“तुमच्या बोर्डिंगाची शिस्त मी मोडली असेल तर मला बोर्डिंगातून डिसमिस करा. संध्याकाळी दाढी केली म्हणून काय आकाश कोसळून पडलें? का धर्म बुडाला? दाढ्या केल्या आम्ही स्वतः, आणि त्याचा डबल चार्ज तुम्हाला काय म्हणून?” सुप. लठ्ठे यांनीं अर्थात् भाऊरावची बोर्डिंगातून उचलबांगडी केली. तेथून निघताच, महाराजांचे मेहुणे मामासाहेब खानवीलकर यांनी आपले चिरंजीव बाळासाहेब यांचे कंपॅनियन म्हणून भाऊरावंची राजवाड्यांत सर्व व्यवस्था लावली.
तेथे ते दोन वर्षे होते. या अवधींत त्यांचा सारा आयुष्यक्रम सरदारांच्या मुलांच्या श्रीमंती सहवासात गेल्यामुळे, बाळपणांतील गोरगरीब मित्रांच्या जीवनाकडे तुलनेनें पाहाण्याची त्यांची सत्यशोधक प्रवृत्ति अत्यंत चिकित्सक व न्यायनिष्ठूर बनली. त्यावेळीं कोल्हापूरांत शेणोलीकर मास्तर असत. ते भाऊरावची तरतरीत बुद्धी, कडवा बाणेदारपणा आणि तत्वनिष्ठा पाहून फार खूष झाले. ते दररोज भाऊरावला खाजगी मोफत शिकवीत असत. त्यांच्या उपदेशाचा भाऊरावच्या शीलकमावणीवर दीर्घ परिणाम झाला. त्याच सुमारास शाहू महाराजांच्या प्रेरणेनें लठ्ठे जाधव डोंगरे प्रभूतींनी सत्यशोधक समाजाच्या पुनर्घटनेचे प्रयत्न चालू केले आणि महाराजांनीं खास अस्पृश्यांकरिता मिस क्लार्क होस्टेल सुरू केले.
या सर्व चळवळींचा भाऊरावाच्या मनावर योग्य तोच परिणाम होऊन ते सत्यशोधक बनले आणि मागासलेल्या अस्पृश्य वर्गासाठीं आपलें तन मन धन वेचण्याची त्यांनीं हृत्प्रतिज्ञा केली. 1908 सालीं हायस्कूलचा मॅट्रिकपर्यंतचा अभ्यास करून भाऊरावनें कोल्हापूर सोडले ते उरूण-इसलामपूरला आले. येथे त्यांचे वडील नोकरीवर होते. कोठेंतरी रेवेन्यू खात्यांत नोकरी धर असा त्यांनीं पुष्कळ आग्रह केला, पण भाऊरावला तो पसंत पडला नाही.
“मला नोकरी करायची आहे, पण त्याची जागा हें रेवेन्यू खाते नव्हे. जन्माला यावें आणि बूकर टी. वॉशिंगटन सारखें जगून अमर व्हावें. सेवावृत्तीच पत्करायची तर महाराष्ट्रांत लक्षावधि अस्पृश्य बांधव जनावरांच्या जिण्यानें जगत आहेत; त्यांना शिक्षणदान देऊन त्यांचा आत्मोद्धार केला तर ती सेवा देवाघरीं कितीतरी रुजूं होईल.” व्यवहारदक्ष वडिलांना ही आपल्या चिरंजीवाची महत्वाकांक्षा एकपरी उत्तम वाटली, पण व्यावहारीक दृष्ट्या कशीसीच वाटली. बरे, भाऊराव म्हणजे एक नंबरचा हट्टी. म्हणेल ते करील. मान तुटेल पण हट्ट तुटणार नाहीं. तेव्हां तो जसा जाईल तसाच त्याल जाऊं देणें हाच मार्ग वडिलांनीं पत्करला.
पहिला अस्पृश्योद्धार
मागासलेल्या वर्गांत शिक्षणप्रसारांशिवाय आत्मप्रबोधन होणें शक्य नाहीं, आणि त्या दिशेनें आपण स्वतःच कांहीं तरी झिजलें पाहिजे, या एकच उदात्त हेतूनें भाऊरावचें चित्त व्यग्र झालें; आणि आज सुद्धा त्यांच्या सर्व धडपडी या एकाच दिशेनें चाललेल्या आहेत. उरूण-इसलामपूरला एक दिवस तरूण भाऊराव तेथील शाळेवरून जात असता, एक गरीबसा मुलगा पाटी पुस्तकें घेऊन वर्गाच्या बाहेर दरवाजाशीं पायरीजवळ बसला होता. मास्तर खोलीच्या दुसऱ्या टोकाला वर्ग शिकवीत होते. त्यांचे काही शब्द कानीं पडले तर पहावें, आली कांही विद्या तर ठीक, नाहींतर नशिब, ही विवंचना त्या दीनवाण्या मुलाच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती. ताबडतोब भाऊराव शाळेंत शिरले. नमस्कार चमत्कार झाल्यावर ‘हा मुलगा एकटाच तिकडे बाहेर कां बसविला?’ म्हणून मास्तरास विचारलें.
मास्तर - ते एक महाराचें पोर आहे. शिकायला येतें. त्याला आत कसें घ्यावें?
भाऊराव - इतर मुलांना आंत घेतां तसेंच घ्यावें. तो मुलगा माणूस नाहीं वाटतं? विद्येच्या मंदिरांत सुद्धां माणसांनीं माणुसकीचा मान राखूं नये, हें काय?
मास्तर - अहो पण तो महार आहे. त्याला आम्ही कसे शिवावें? कांही धर्मबिर्म आहे कीं नाहीं?
भाऊराव - बरं, इतक्या लांब पायरीजवळ बसून त्यानें शिकावें तरी कसें आणि काय?
मास्तर - आहे, ही महारड्यांची पोरं. काय कर्म शिकणार? सही करण्यापुरती अक्कल आली तर आली.
भाऊराव संतप्त झाले. त्यांनीं त्या मुलाचा हात धरला आणि म्हणाले “बाळ, तूं या धर्मवान शाळेत जन्मभर बसलास, तरी कांही फायदा होणार नाही. चल तूं माझ्या घरीं. मी तुला स्वतः शिकवून विद्वान करतो.” अस्पृश्यांचा हा कोण कैवारी? आणि तो मज दीनावर अवचित कसा प्रसन्न झाला? इत्यादि अनेक कल्पनातीत भावनांनी त्या मुलाचे हृदय भरून आले. तो टपटपा अश्रू गाळू लागला.
भाऊराव त्याला तेथूनच घरी घेऊन गेले. वडील मातोश्रींना हे हिंदुधर्माच्या लायकीचे व ‘समत्वं योग उच्यते’ चे जिवंत चित्र दाखविले. तेथून त्या मुलास कोल्हापुरास नेऊन मिसक्लार्क हॉस्टेलमध्ये घातले व त्याचे शिक्षण इंग्रेजी 6 यत्तेपर्यंत स्वार्थत्यागपूर्वक पूर्ण केले. वाचकहो, ते महाराचे गरीब महत्वाकांक्षी पोर कोण? माजी
आमदार ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप M.L.C.
हें होय. महाराष्ट्रीय अस्पृश्यांच्या विद्यमान चळवळींतला हाच पहिला कर्तबगार तरूण. यानी ‘मूकनायक’ नांवाचें एक उत्कृष्ट साप्ताहिक चालवून, आणि कौन्सिलांतहि अस्पृश्यांच्या उद्धारार्थ पुष्कळ परीश्रम केले व सध्यां करीत असतात. सांप्रत, सातार्यास ते डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डचे व स्कूलबोर्डचे मेंबर आहेत. हे उत्तम भाषक व लेखक आहेत. अलीकडे अस्पृश्यांमध्येंच जी भटी धाटणीची व्यक्तिद्वेषाची वावटळ सुरू झालेली आहे, तिला कंटाळून श्री. घोलपांनीं सध्यां भाषण लेखन तपश्चर्येत मूकवृत्ति धारण केलेली आहे. पण आम्हांला आशा आहे कीं अस्पृश्य समाज हिरा आणि गारगोटींतला भेद लवकरच जाणून, घोलपासारख्या स्वयंप्रकाशी पुढार्याच्या कर्तबगारीचा आत्मप्रबोधनार्थ योग्य तो उपयोग करून घेईल.
भाऊरावचे शिक्षणदानाचें कार्य केवळ अस्पृश्य वर्गापुरतेच होते असें नव्हे. मराठे व तत्सम जातींतल्या अनेक मुलांनाहि त्यांनीं पदरमोडीनें शिक्षण कपडे पुस्तकें पुरवून आज चांगल्या प्रतिष्ठीत स्थितींत आणून ठेवले आहेत. कोणी पोलीस सब इन्स्पेक्टर, कोणी वकील, कोणी शिक्षक, कोणी कारकून अशा नानाविध व्यवसायांत ते आहेत. एका जैन परिषदेच्या प्रसंगी भाऊराव व्हॉलंटियरचे कॅपटन होते. त्यावेळीं त्यांची चलाखी शिस्त टापटीप वगैरे पाहून मुंबईचे सुप्रसिद्ध दानवीर शेट माणिकचंद पानाचंद यांनी दरमहा ३० रु. स्कॉलरशिप देऊन, हिर्या मोत्यांची परीक्षा कशी करावी, याचें शिक्षण देण्याकरितां मुंबईस स्वतःच्या पेढीवर नेले.
त्याचवेळीं दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये भाऊरावनीं अकौंटन्सीचाहि कोर्स घेतला होता. पुढें आजारी पडून १९११ सालीं परत सातार्यास आल्यावर भाऊरावनी एका वर्षात इंग्रेजी १ ते ३ इयत्ता शिकविण्याचा एक खासगी वर्ग उघडला. या वर्गात मागासलेले ब्राम्हणेतर व अस्पृश्यांची पुष्कळ मुले शिक्षण घेत असत. पण त्यांत बराचसा भरणा मोफत विद्यार्थ्यांचाच असे. कारण, गरजू विद्यार्थी आणि तो भाऊरावच्या दारात आला पुरे की त्याची सोय झालीच.
मग त्या पायी वाटेल ते नुकसान झालें तरी त्याची भाऊरावला पर्वा काय? काले येथील बरेच विद्यार्थी या क्लासांत असत. त्यांची हुषारी पाहून कित्येक आय.सी.एस. अधिकाऱ्यांनीं त्यांना खासगी स्कॉलरशिपा दिल्या व ते परत विलायतेला गेले तरी तेथून परस्पर त्यांच्या विद्यार्थ्यांना मनीआरडरी येत असत. भाऊरावच्या प्रयत्नांमुळें सातारा जिल्ह्यांत काले हें एक सर्व उत्तम चळवळीचें केंद्र झालें आहे. या इंग्रजी क्लासामुळें पुष्कळ गरीब विद्यार्थी स्वावलंबनी झाले व आजहि आपल्या ‘पाटील मास्तर’चेे उपकार कृतज्ञतापूर्वक स्मरत असतात.
सन १९०९ सालीं वडिलांची बदली साताऱ्यास झाली. त्या वेळीं रुद्राजीराव राजे महाडीक मराठा समाजात जागृतीचे प्रयत्न करीत होते. त्यांच्याशीं भाऊरावनें सहकार्य करून व्याख्यानद्वारां पुष्कळच मदत केली. औद्योगिक व शेतकी संवर्धक संस्था काढून, त्यांतील फायद्यांवर मोफत शिक्षणाचें कार्य करतां येईल, ही एक नवीन कल्पना भाऊरावला या वेळी आली; आणि प्रयोगासाठी ऑ. कॅपटन रामचंद्रराव हरजीराव महाडीक, रा. सा. तात्या रावजी पाटील, पिलोजी राजे शिरके, रामभाऊ चिटणीस व बाबासाहेब चित्रे वकील, यशवंतराव प्रतापराव गुजर, दुधुस्कर मामलतदार इत्यादि मंडळींच्या सहायानें
कृषिकर्म सुधारणा मण्डळ
नांवाची एक संस्था रजिष्टर करून घेतली. मि. ब्रॅन्डन कलेक्टरनें मण्डळाच्या डेप्यूटेशनला सर्व प्रकारची मदत देण्याचें आश्वासन दिलें. कोरेगांवचे भाऊसाहेब बर्गे यांनी आपल्या मालकीची २०-२५ एकर जमीन लांब मुदतीनें व कमी दरानें मण्डळाला दिली. डॉ. मॅन साहेबानें पाणी व मातीचें ॲनालिसिस केलें. आग्रिकलचरल खात्याचें इंजिनियर परांजपे व शूट साहेब यांनी लिफ्ट इरिगेशनचा सल्ला दिला. शेअरच्या विक्रीसाठीं भाऊरावनें पंजाबांत कोहटपर्यंत प्रवास केला. पण इतक्यांत भाऊराववरच कोल्हापुरी राजकारणाचें प्राणघातक गंडांतर आल्यामुळें या मण्डळाला राम म्हणावा लागला.
कोल्हापुरी राजकारणी गण्डांतर
अर्धवट आणि किंचित अस्पष्टच कां होईना, पण १९१४ सालीं कोल्हापुरांत एडवर्ड बादशाहाच्या पुतळ्याला डांबर फासल्याचें जें एक भयंकर प्रकरण उपस्थित झालें होतें, त्याचा एक महत्वाचा भाग आजच प्रथमतः प्रबोधनात मुद्रणसंस्कार होऊन जगापुढें येत आहे. बोलून चालून तें राजकारण! तेव्हा त्याचे पापुद्रेहि फार हलक्या हातानें सोलण्याचा यत्न केला आहे. या प्रकरणीं घडलेल्या किंवा मुद्दाम घडविलेल्या अत्याचारांची मढी उकरण्यात अनर्थ नसला तरी अर्थ आहे.
अनर्थ झाला तरी त्याची आम्हांला पर्वा नाहीं. खबरदारी एवढीच घेतली आहे कीं या अत्याचारांचे वणवे पेटविणाऱ्या कित्येक जिवंत नरपशूंचा नामनिर्देश अज्जीबात टाळला आहे. या पुतळा-डांबरीचे डांबीस प्रकरण प्रो. लठ्ठे यांनी आपल्या शाहूचरित्रांत अज्जिबात गाळून त्यातल्या अत्याचारांच्या अध्यायांचा पूर्ण स्वाहाकार केलेला आहे. कदाचित्, त्यांत त्यांचा स्वतःचा दुर्दैवी संबंध जोडण्याच्या कोल्हापुरी पोलीसांनी केलेल्या भानगडी या शुद्ध राजमान्य ‘पोलिसी पॉलिसी’ असल्यामुळें त्यांचे महत्व प्रो. लठ्ठे यांनीं भावी दिवाणपदप्राप्तीच्या मुत्सद्देगिरीनें डावलण्याची चलाखी दाखविली असावी, असें आम्हाला वाटतें. १९०७ सालच्या टिळकपंथी माथेफिरूंची अत्याचारी कारस्थाने कोल्हापुरांत सुरूं झाली.
त्यामुळें संस्थाननेंहि त्यांना पायबंद लावण्यासाठीं आपल्या उघड गुप्त पोलीस यमदूतांच्या सेनेला सर्वाधिकारांची शस्त्रसामुग्री भरपूर दिली. तेव्हांपासून कोल्हापुरी पोलीस म्हणजे प्रतिसृष्टीकर्त्या विश्वामित्राचे बाप आणि यमधर्माचे शिरजोर सावत्रभाऊच बनले होते. राज्यकर्त्यांचे कानच या महात्म्यांच्या हाती पडल्यावर वाटेल त्या सावा चोराची मान फांसावर लटकविणें म्हणजे विडीच्या झुरक्या इतकीच त्यांची सहजलीला होऊन बसली. असल्या नाजूक परिस्थितीत १९१४ सालीं कोणी माथेफिरू माणसानें कोल्हापूरच्या बागेंतील एडवर्डच्या पुतळ्यावर डांबर ओतली. जिकडे तिकडे हाहाःकार उडाला. पोलीशी ठाणीं गदगदा हादरलीं.
गुप्तदूतांचीं नाकें व कान मैलमैल लांब वाढले. डांबर्या वेरड हुडफून काढण्याच्या तगाद्याचा महाराजांचा हंटर पो. सु. फरनांडीझच्या पाठीवर दिवसांतून चोवीस वेळ फडाडूं लागला. गांवांतील रिकामटेकड्या उपद्व्यापी लोकांनींहि पोलीशी गुप्तसेनेंत प्रवेश करून घेतला. असे करण्यात या हरामखोरांचा उद्देश निराळाच असतो. पोलीसांचें पाठबळ मिळाले म्हणजे अनेक सुष्ट दुष्ट व्यक्तींवरील आपल्या खासगी किंवा व्यावहारीक व्यक्तिद्वेषाचा सूड भरपूर उगऊन घेतां येतो.
या वेळीं लठ्ठे डोंगरे आणि जाधव या तीन विद्वानांचें तेज कोल्हापुरांत बरेंच होतें. प्रत्येक विवेकवादी चळवळीत हे पुढारी असत. जात्याच विद्वान बहुश्रुत व्यासंगी आणि चिकित्सक असल्यामुळे या तिघांपुढें कोल्हापुरांतील सर्व ब्राम्हणेतर शालशिष्ट तेजोहीन झाले होते. सामाजिक चळवळी बरोबरच राजकीय सुधारणेविषयीं त्यांच्या स्पष्टोक्ती राजसत्तेला जवळ जवळ डोईजड होऊं लागल्या होत्या. विशेषतः प्रो. लठ्ठे यांच्या वाग्लेखन शरचापल्यामुळें त्यांच्या हितशत्रूंच्या फलटणी कोल्हापुरांत बर्याच निर्माण झाल्या होत्या. जातींतीलहि बरेच उपद्व्यापी लोक यांच्या पाडावाचा प्रयत्न करीत होते.
कित्येक कोल्हापुरी अधिकाऱ्यांना व पोलीस खात्यालाहि प्रो. लठ्ठे यांनीं वेळोवेळी टाइम्स वगैरेच्या कालमातून प्रतोदप्रहार लगावलेले असल्यामुळें, तेहि त्यांच्यावर मनांतून जळफळत असत. अशा लोकांना ही पुतळ्याची डांबर म्हणजे प्रो. लठ्ठ्यांविरुद्ध चालवायला एक उत्तम शस्त्रच सापडले. हितशत्रूंची अक्कल आणि पोलीशी शक्कल या दोन शक्ती एकत्र एकवटल्यावर काय घटना निर्माण होणार नाही? निश्चित नपूंसकावरहि जबरी संभोगाचा आरोप सिद्ध होईल, मग सुविद्य सुसंस्कृत आणि विवेकी मनुष्यावर पुतळ्याची डांबर ओतणें, पोलीशी अकलेच्या हातचा मळ!
प्रो. लठ्ठ्यांना या प्रकरणात अडकवायचेंच इतकें निश्चित ठरल्यावर, मग पुराव्याला काय तोटा? पुराव्यानें आरोपी हुडकण्या ऐवजीं, आरोपीसाठीं पुरावा हुडकण्याचें काम फार सोपें असतें; आणि या कामीं बलीदानासाठीं निश्चित ठरविलेल्या अजापुत्राचे जातभाईच जर इतर हितशत्रूंसह अहमहमिकेनें पुढें सरसावले, तर चोर सोडून संन्याशाला फाशीं द्यायला पोलीसांच्या बापाचें काय वेचतें? पुराव्यासाठी प्रो. लठ्ठ्यांच्या विरुद्ध असणार्या-निदान आहेत अशा दिसणाऱ्या-व्यक्ती शोधण्याची खटपट झटपट सुरू झाली. त्याचा एक सूक्ष्म धागा १९०६ सालच्या जैन बोर्डींगातल्या दाढीप्रकरणाला जाऊन भिडला आणि भाऊराव पाटील हा तरूण लठ्ठ्यांच्या विरुद्ध आहे, या (भ्रामक) भावनेने त्याला पुराव्याचा साक्षीदार म्हणून मथविण्याचा बेत ठरला.
दाढीप्रकरणानंतर दुसऱ्याहि एका सामाजिक मतभेदाच्या प्रश्नांत भाऊरावनें आण्णासाहेब लठ्ठ्यांना मतभेदाची जोरकस टक्कर दिलेली होती. परंतु मतभेद म्हणजेच हाडवैर अशा समजुतीच्या उकीरड्यांत पिचणाऱ्या कावळ्यांना या दोन विवेकी तरुणांच्या आत्मीय जिव्हाळ्याची काय कल्पना असणार? आण्णासाहेबांच्या विरुद्ध जे कारस्थानी अ ब क ड मंडळ उभे राहिले, त्यांतल्या एका क नें भाऊरावला कोरेगांवास तार पाठविली कीं जरूरीचे काम आहे ताबडतोब येऊन भेटा. गरीब व गरजू मुलांना शिक्षणदान करण्यांतच आनंदमग्न असलेल्या भाऊरावला या कोल्हापुरी कोलदांड्याची काय कल्पना असणार? तार मिळतांच भाऊराव कोल्हापूरला गेले. दिवस इकडच्या तिकडच्या गप्पांत गेला. रात्रीं जेवण आटोपतांच हळूंच पोलीशी थाटांत विषय निघाला. ‘दीड महिन्यापूर्वी येथल्या एडवर्डच्या पुतळ्याला डांबर फांसण्यांत आलेली आहे.
पोलीसांनीं तपास करून छेडा लावला आहे. त्यांत आण्णासाहेब लठ्ठ्यांचा हात आहे, अशी त्यांची खात्री झाली आहे. महाराजांनीं मला खास सांगितलें आहे कीं या बाबतींत भाऊराव पाटीलानें सरकारच्या बाजूनें साक्ष देऊन आण्णासाहेबांच्या विरुद्ध पुरावा केला पाहिजे. यांत तुमचें कल्याण आहे. असें न कराल तर काय प्रसंग ओढवेल त्याचा नियम नाहीं.’ भाऊराव चकितच झाले. क्षणभर विचार करतांच त्यांना उमगलें कीं आपण एका भयंकर जाळ्यांत येऊन पडलों आहों. काय वाटेल तें करून आण्णासाहेबांना चिरडण्याचा हा राजमान्य कट आहे आणि त्या कामीं खाटकाचें काम बळजबरीनें आपल्या माथीं लादण्याचा हा नातूशाही पेंच आहे. भाऊरावने दोन्ही कानांवर हात ठेऊन ‘क’ च्या सूचनेचा शक्य त्या तीव्र शब्दांत निषेध केला.
त्या गृहस्थाची पुष्कळ निर्भत्सना केली. परंतु उपयोग काय? प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पोलीशी पेच पडल्यावर नेहमीच्या व्यवहारांतली निषेधी सभ्यता किंवा माणुसकीचा सात्विक अथवा तामसी त्वेष म्हणजे पालथ्या घड्यावरील पाणी किंवा नपुंसकापुढे पद्मिणीचा शृंगारच ठरायचा! भाऊरावला मथविण्यांत कटवाल्यानें जान जान पछाडली. महाराजांच्या क्रोधाची धमकी घातली. सर्व कांही केले. पण तो कांही वळेना. रात्री १२ चा सुमार झाला. ज्या घराच्या माडीवर कं आणि भाऊराव यांची शाब्दिक झटापट चालली होती, त्याच्या तळमजल्यावर एकाकी आग लागली. लागली म्हणण्यापेक्षा लावली म्हणणेंच योग्य होईल.
जिकडे तिकडे धावाधाव होऊन आग विझाली. त्याच गडबडींत ‘क’ नें पुकारा केला कीं ‘माझ्या एक हजार रुपयांच्या नोटा चोरीस गेल्या.’ पोलीसनें तक्रार टिपून घेतली. स्थिरस्थावर झाल्यानंतर ‘क’ भाऊरावला ठासून म्हणाला “आतां वळणावर येतोस कीं हें आगीचें आणि चोरीचें त्रांगडें अडकऊं तुझ्या गळ्यांत?” भाऊरावनें तितक्याच जोरानें उत्तर दिलें “तुझी अवलाद जैनाची आहे कीं महाराची? मी फांसावर गेलो तरी बेहत्तर, पण खोटें काम कधिं करणार नाहीं. जा तुला वाटेल तें कर.” या वेळीं पहाटेच्या ५ चा सुमार होता. थोड्याच वेळांत एकदम कांही पोलीस ‘क’ च्या माडीवर घुसले आणि भाऊरावला पकडून घेऊन गेले.
कोल्हापुरी पोलीसांचे अत्याचार
भाऊरावची अटक केवळ पोलीशी प्रेरणेचीच होती असें नव्हे, तर त्याची सूत्रें खुद्यांकडूनच हालत होती. वाटेल ती उलाढाल करून डांबर प्रकरणांत लठ्ठ्यांना लोळविण्याचा महाराजांचा निश्चयच होऊन बसला होता, मग त्याच्या मागें पोलीसांची कानचावणी असो, नाहींतर लठ्ठ्यांच्या हितशत्रूंची हातलावणी असो. भाऊरावला जामीनावर सोडविण्याचा कांहीं मित्रांनी प्रयत्न केला, पण अर्ज नामंजूर झाला. इतकेंच नव्हे, तर तसा यत्न करणारांना ‘याद राखून ठेवा’ या त्र्यक्षरी पदवीचें धमकीदान झालें.
कावळ्याचा बंगला हें एक कोल्हापुरांतले कुप्रसिद्ध स्थळ आहे. या एका बंगल्यात अत्याचाराचे जितके अमानुष प्रकार झाले आहेत तितके यमपुरीच्या देखाव्यांत सुद्धां पाह्यला मिळायचे नाहीत. ‘तुला जरीमरी येवो’ असा कोणी कोणाला शाप दिला तर मनुष्य त्याची हासण्यापलीकडे किंमत करणार नाही, पण 1907 सालापासून कोल्हापुरांत कावळ्याचा बंगला हे नांव ऐकतांच शेकडो माणसें गारठून जात असत.
आरोपीच्या तोंडून सत्याचा अर्क पिळून काढण्याचे पोलीशी घाणे या बंगल्यांत राजरोस रात्रंदिवस सुरूं असत. अमक्या तमक्याला ‘कावळ्याच्या बंगल्यावर नेला’ इतकी बातमी कळली कीं खुशाल त्याची सर्वांनीं आशा सोडावी. परत आलाच तर पुनर्जन्म होऊनच यायचा. सत्यार्क पिळून काढण्याची सर्व आयुधें या बंगल्यात सज्ज असत आणि ती पद्धतशीर उपयोंगात आणणारे कसाईहि त्या काळी कोल्हापुरी पोलीससेनेंत पुष्कळ असत.
भाऊराव जर डांबर-प्रकरणांत आण्णासाहेब लठ्ठे यांच्या विरुद्ध साक्षीचा पुरावा करता, तर सहज पांच सहा हजार रुपये खिशांत टाकून मोकळा सुटता. पोलीसांनीं मुस्कटमारी, उरधोंडी, बरगडफोडी वगैरे प्राथमिक समजुतीचे प्रयोग भाऊराववर केले. पण तो कांहीं बने ना! अखेर त्याला कावळ्याचा बंगला दाखविला. तेथे तक्तपोशीच्या बहालाला भाऊरावचे हातपाय बांधून टाकीत आणि खालून पाठीवर व कुल्यावर चामड्याच्या हंटरचे तडाखे हाणीत. एक हंटऱ्या थकला कीं दुसरा, दुसऱ्या नंतर तिसरा, थोडी विश्रांति, पुन्हा ‘मागील अंकावरून पुढें चालूं.’ असा प्रकार रक्तबंबाळ होईपर्यंत चाले.
भाऊराव शिवाय आणखीहि कांही तरूण या राजमान्य पद्धतीनें मथविण्यात येत होते. एकदा पोलिसच्या पहाऱ्यांत बहिर्विधीसाठीं बाहेर पडले असतांना, वाटेंत एक रिकामी विहीर भाऊरावला लागली. विहिरीत पाणी नव्हते. वर खालीं बाजूला काळा कडक फत्तर. क्लेशपूर्ण जीवाचा पूर्णविराम करण्याची ही संधी छान आहे, असा निश्चय करून, पोलीसांची नजर चुकवून, भाऊरावनें हिसक्यासरसे खालीं डोकें करून धाडकन विहीरींत उडी घेतली. कल्पना ही कीं डोके कातळावर हापटून चटकन प्राण जावा! परंतु, वेळ आली तरी काळ आला नव्हता. खालीं डोकें करून उडी मारली, तरी अखेर तळाच्या चिखलावर भाऊराव ढुंगणावरच सुखरूप येऊन आदळला. कोठें कांहीच दुखापत नाहीं.
पूर्वी लहानपणी सर्पदंश झाला होता. त्यांतूनहि बचावला. त्यानंतर हा आत्महत्येचा प्रसंग विलक्षण चमत्काराने टळला. पोलीसांनी धामधूम करून आरोपीला वर काढले. मॅजिस्ट्रेट पुढें उभे केले. जबानी घेतली. आत्महत्येचा आरोप ठेवला. दवाखान्यात रवानगी झाली. येथून सुटल्यावरहि पुन्हा कावळ्याचा बंगला आणि शिक्षा आहेच. त्यापेक्षां पुन्हा एकदां या कष्टमय जीवाचा अंत करण्यासाठीं भाऊरावनें तावदानाची कांच फोडून त्याची मूठवर भुकटी खाल्ली.
तास दीड झाला तरी कांही परिणाम होई ना, म्हणून वर एक बाटलीभर घ्यासलेट पिऊन टाकलें. पण काहींच परिणाम झाला नाहीं. पुढे, दवाखाना सुटल्यावर न्यायदान होऊन, आत्महत्येच्या प्रयत्नाबद्दल ८ महिन्याची साधी कैदेची शिक्षा ठोठावण्यांत आली. कैद साधा होती, तरी भाऊरावला बिलंद कटवाला दामू जोशाच्याच कोठडींत कोंडण्यांत आलें होतें.
प्रो. लठ्ठे यांना प्रत्यक्ष जरी अटक केली नव्हती, तरी त्यांच्यावर गुप्तपोलीसांची सक्त छाया ठेवण्यात आली होती आणि त्यांच्या टेबलांतून कांही ‘राजद्रोही वाङमयहि कोल्हापुरी चित्रगुप्तांनी पैदा करून, त्याचें पुराव्याच्या बरणींत लोणचें घालून ठेवलें होतें. कावळ्याच्या बंगल्यांतून पुराव्याची प्रसूति होतांच लठ्ठ्यांना कड्याबेड्या ठोकण्याची जय्यत तयारी होती. पण पुरावाच तयार होई ना. कित्येक लाळघोट्या प्रतिष्टित अधिकार्यांनी जेलमध्ये जाऊन भाऊरावला ‘सरकार म्हणतात तसे म्हणावे’ म्हणून आग्रह केला.
वकीलपत्रावरची सही कबूलीपत्रावर उमटविण्याची एका मराठा वकीलानेहि कारवाई केली; पण भाऊरावच्या आईच्या तात्कालिक दक्षतेनें ते पत्रक चुलींत गेलें. महाराजांनी तिला भेटीस बोलावून “भाऊराव जर योग्य ती जबानी देईल तर तुला पांच हजार रुपये रोख व जमिन देऊं.” असा गळ घातला. भाऊरावचीच आई ती! तिनें स्पष्ट करारानें उत्तर दिलें “महाराज, मला चार मुलगे आहेत. त्यातला एक मेला म्हणून समजेन. पण मी खोटे काम करणार नाही, आणि भाऊरावहि करणार नाहीं.” एक दिवस खास महाराजाकडून समजूत करून पहावी म्हणून पुन्हा भाऊरावला भेटीस नेले. पुष्कळसें व्याख्यान ऐकून घेतल्यावर भाऊरावने एकच उत्तर केलें. “या जगांत मला आता जर कांहीं आश्रयाचें व संरक्षणाचें ठिकाण असेल तर तें एकच-मरण. तेवढें आपण द्यावें म्हणजे झाले. मला जास्त बोलण्याची इच्छा नाहीं.”
जोपर्यंत भाऊरावावर निश्चित कांहीं आरोप जाहीर करण्यांत आलेला नव्हता, पोलीशी तपासाचेच फार्स चालत होते, तोंपर्यंत त्यांच्या वडिलांना मित्रांना आणि हितचिंतकांना कांहींच प्रयत्न करतां येई ना. अखेर मुख्य भानगडीचा मुद्दा बाजूस राहून जेव्हां आत्महत्येच्या प्रयत्नाबद्दल शिक्षा झाली, तेव्हा वडिलांनीं अपिल दाखल करण्याची खटपट सुरू केली.
इकडे कोल्हापुरी पोलिसांचे प्रयत्न मात्र बंद पडले नव्हते. त्यांनीं ब्रिटिश सरकारकडून दोन पटाईत गुप्तपोलीस मदतीला बोलावले होते. त्यांपैकीं एकाने भाऊरावच्या सातारच्या रहात्या घरांत राजद्रोही वाङमय पैदा करण्याचा विश्वामित्री घाट घालून, त्या खटपटींत सातारचे त्यावेळचे फौजदार कै. अनंतराव गणेश देशमुख यांच्या सहकार्याची याचना केली. भाऊराव पाटील ही व्यक्ती कोण आहे आणि तिचा सामाजिक दर्जा काय आहे, याची कल्पना सातारचे कलेक्टर मि. ब्रांडन पासून तों थेट एखाद्या अस्पृश्याच्या झोपडीपर्यंत सर्वांना स्पष्ट होती आणि भाऊरावावर उद्भवलेल्या निष्कारण गण्डांतराकडे सर्व काळजीपूर्वक नजर ठेऊन होते.
भाऊरावच्या घरांत झडतीमध्यें पैदा करण्यासाठीं आणलेला कोल्हापुरी कोलदांड्याचा बनावट पुरावा देशमुख फौजदाराने प्रथम हस्तगत करून घेतला आणि त्या गुप्तपोलीसांना दम भरला ‘‘या पुराव्याच्या जोरावर मी आतां तुम्हाला अटक करून बेड्या ठोकतो, तुम्ही काय समजलांत? हरामखोर, खोटें पुरावे तयार करता? लाज नाही वाटत तुम्हाला? आत्ताच्या आत्ता साताऱ्याची हद्द सोडून चालते व्हा, नाहींतर तुमच्यावर खटला भरल्याशिवाय सोडणार नाहीं.” गुप्तपोलिसांना देशमुखांची पायचाटणी करतां करतां पुरे वाट झाली व त्यांनी तात्काल तेथून यःपलायते सजीवति केलें.
हा डाव फसल्यावर दुसरा प्रयत्न झाला. औंध प्रकरणांत प्रसिद्धीस आलेला सातारा जिल्ह्यांतील गणपति मांग याला भाऊराव विरुद्ध कोल्हापुरी राजद्रोहाची साक्ष देण्यासाठीं कोल्हापुरास नेले. त्याला पुष्कळ मथविलें आणि तोहि कबूल झाला. ‘भाऊ पाटील’ म्हणजे कोण प्राणी, ही त्याला प्रथम कल्पनाच येइना. असेल कोणी गोम्या सोम्या. माझ्या साक्षीनें मेला तर मरेना का. एवढीच त्याची समजूत. प्रत्यक्ष रुजुवात करून जबानी घेण्याची वेळ आली आणि कैदी भाऊराव गणप्या मांगापुढे आणून उभे केलें मात्र, तों त्याला एकदम विलक्षण गंहीवर येऊन त्यानें ‘कोण पाटील मास्तर?’ म्हणून आरोळी ठोकून भाऊरावच्या पायाला घट्ट मिठी मारली. तो मोठ्याने रडू लागला.
कांही केल्या पाय सोडी ना. ‘भाऊराव पाटील’ म्हणजे मांगवाड्यात येऊन आपल्या मुलाला श्रीगपासून ते इंग्रजी ५ व्या यत्तेपर्यंत मोफत शिक्षण देणारा दीनांचा पुरस्कर्ता ‘पाटील मास्तर’! हें पाहून गणप्या मांग ओकसाबोकसी रडूं लागला. तो कडव्या उच्चारांत पोलीसांना म्हणाला “मला या पाटील मास्तरांच्या विरुद्ध साक्ष द्यायला सांगता काय? माझी मान तोडलीत तरी हा गणप्या मांग ही कसाबाची करणी करणार नाहीं. अरे, ज्यानें माझ्या मांगाच्या पोराला विद्या शिकवून माणुसकी दिली, त्याची मान मी कापू? जातीनें मी मांग आहे. मी पाटील मास्तरशीं बेमान नाहीं होणार.” जातीवंत मांग सुद्धां जेव्हां पोलीसांपेक्षा विशेष माणुसकी दाखवूं लागला, तेव्हां त्याला आणला तसा परत रवाना केला.
ब्रिटिश गुप्तपोलीसांपैकी रा. मडूरकर नांवाचे एक सभ्यवृत्तीचे सब इन्स्पेक्टर होते. त्यांनाहि देशमुख फौजदाराप्रमाणें खोट्याची फार चीड असें. ते वरचेवर भाऊरावला जेलमध्ये भेटून धीर देत असत. इतकेंच नव्हे तर, असा स्पष्ट इशारा देत कीं “कोणी वाटेल तें केले तरी खोटें कधीं सांगूं नकोस.”
इकडे भाऊरावचे अपील दाखल झालें. घडलेल्या सर्व प्रकारांचाहि गवगवा बाहेर फुटला. सातारचे कलेक्टर मि. ब्रांडना साहेबहि या प्रकरणाकडे सहानुभूतीनें पाहूं लागले. पोलिटिकल एजन्ट पर्यंत त्याची तक्रार गेली. त्यांनीहि खास चौकशी केली. तेव्हा होत असलेला साराच प्रकार शून्यांतून ब्रम्हांड निर्माण करणारा आहे, असे त्यांना प्रत्यंतर पटले. कैदी भाऊरावची त्यांनी आपल्या बंगल्यावर एकांती भेट घेऊन सर्व खुलासा काढला. त्याचा परिणाम अपीलावर होऊन भाऊराव माफींत सुटले. पण सुटेपर्यंत दीड महिन्याची शिक्षा मात्र भोगली.
या अपीलांत सुटतांच, कोल्हापूरच्या पोलिस कमिशनरने नवा तोंडी हुकून काढला कीं डांबर प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत भाऊरावनें कच्च्या कैदेंत राहिलें पाहिजे. हा हुकूम भाऊरावला देऊन त्याला जेलकडे घेऊन जात असताना रेलवेच्या कंपौडांत त्यानें उडी घेतली. “मी ब्रिटिश हद्दींत उभा आहे. खबरदार माझ्या अंगाला हात लावाल तर.” इतक्यात रेलवेचा पोलीसहि तेथें आला. त्याला भाऊराव म्हणाले, “तुला वाटेल तर मला पकड. मी रेलवेच्या किंवा ब्रिटिश पोलिसांच्या ताब्यांत जायला खुषी आहे. माझ्यावर कांहीं आरोप असेल तर ब्रिटिश कोर्टात होईल त्याचा निकाल.” कोल्हापुरी पोलीस हात चोळीत गेले. रेलवे पोलीसानें विचारपूस करून भाऊरावला सोडून दिले.
पुढें लागलेच वडिलांनी कोल्हापुरी कायद्याची भूक शमविण्यासाठीं जामीन दिला व येथेंच हें प्रकरण विझालें. या बाबतींत भाऊरावनें मुंबईगव्हर्नरला एक मोठा विस्तृत तपशिलाचा अर्जहि पाठविला होता. त्याची नक्कल अस्तित्वांत आहे. तब्बल सहा महिनें निष्कारण यमयातना भोगल्यामुळें भाऊरावच्या शरीर प्रकृतीवर एवढा भयंकर परिणाम झाला होता कीं कोणालाहि चटकन् ओळख पटली नाही. पुनर्जन्मच तो!
भाऊराववर निष्कारण आलेल्या या भयंकर गण्डांतराच्या इतिहासावरून वाचकांना पुष्कळ निर्णय काढता येतील. भाऊरावच्या शिलाची कमावणी किती खडतर तपश्चर्येची आहे आणि आज त्यांची जी त्यागी कंटक वृत्ति बनलेली आहे, त्यात जगातल्या कटु अनुभवाचा मसाला किती पडलेला आहे, याचा पुष्कळ उलगडा होतो. या कहाणींत रौद्र बीभत्स करूण आणि वत्सल रस अपरंपार भरले आहेत. जीव गेला तरी खोटें कर्म करणार नाहीं, या वृत्तीनें भाऊरावनीं हे एवढें भयंकर क्लेश ज्या आण्णासाहेब लठ्ठ्यांसाठीं भोगले, त्यांना प्रत्यक्ष त्रास किती झाला आणि डांबर-प्रकरणांत त्यांना हकनाहक लटकविण्यात शाहूमहाराजांचा डाव कोणता होता, इत्यादि माहिती लठ्ठेच सांगतील तेव्हां जगाला कळेल.
त्यांनीं शाहूमहाराजांचें चरित्र उत्तम तपशीलांनी कितीहि रंगविले असले, तरी शाहू महाराजांच्या राजधानीने खुद्द आण्णासाहेबांचे चरित्र मात्र फार बहारीच्या कुतुहलानें रंगविलेलें आहें, यात मुळीच शंका नाहीं. एका काळीं ज्यांना राजद्रोहाचा शिक्का ठोकून रसातळाला नेण्यासाठीं ज्या रियासतीच्या राजकारणानें आपले जंगजंग पछाडले व एकदा प्रत्यक्ष अटकहि केली होती, त्याच रियासतीच्या कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम् दिवाणगिरीवर त्यांचीच अचानक नेमणूक झालेली पाहून, करणीच्या काळापेक्षा काळाचीच करणी अगाध खरी, असा कोणाच्याहि तोंडून उद्गार निघेल. डांबर प्रकरणांत ‘भिंतीचा निर्जिव हंस, त्याने गिळिले हारास’ हा चमत्कार स्पष्टच होता.
पण पुढें पहावें तों हातपाय तोडलेला विक्रम तेल्याचा घाणा हाकतो काय, दीपराग आळवतांच इलेक्ट्रीसिटीचे बटन दाबल्याप्रमाणें दिवे लागतात काय, राजकन्येचें लक्ष त्या दीपोत्सवाकडें वेधते काय आणि विक्रमाचा भाग्योदय होतो काय! साराच चमत्कार. ज्या कोल्हापुरांतले सिऐडी एक वेळ आण्णासोहब लठ्ठ्यांवर कडव्या कदरीची टेहळ ठेऊन बसले होते, त्याच कोल्हापुरात तेच लठ्ठे त्याच सिऐडी ऑफीसरांवर दिवाणगिरीच्या करड्या हुकमतीचे कोरडे ओढीत असतांना, त्या पखालीच्या बैलांना काय बरें वाटत असेल? भाग्योदय व्हावा तर तो असा! क्षात्रजगद्गुरूंनी राजाराम महाराज छत्रपतींना वेदोक्त राज्याभिषेक केला. तो विधी संपतांक्षणीच एकट्या आण्णासाहेब लठ्ठ्यांनी पुन्हां उभे राहून आणखी एक कसलासा अभिषेक केला. ही बातमी वृत्तपत्रांत वाचता क्षणीच आम्ही तर्क केला कीं भिंतीच्या निर्जीव हंसाने गिळलेला हार तो ‘आज सावकाश उगाळीत’ आहे खास. पुढें थोड्याच अवधींत दिवाणगिरीची विचारणा! आण्णासाहेबांचे चरीत्र अशा प्रकारच्या नानाविध कुतुहलांनी रंगलेले पाहून विधिघटनेचे मोटें कौतुक वाटते.
शाहू महाराजांनीं भाऊरावचा एवढा छळ केला कीं त्यातून पुनर्जन्म होणें हा केवळ दैवयोगच मानला पाहिजे. इतकें असून सुद्धां भाऊरावची शाहू महाराजांवरील भक्ति तिळमात्र कमी झालेली नाहीं. ब्राम्हणेतर चळवळ सुरू झाल्यानंतर महाराज भाऊरावला अनेक वेळां भेटले, मसलती केल्या, पण सगळ्या ब्रिटीश हद्दीत. भाऊरावनी कोल्हापुरांत पाऊल ठेवलें नाही. मृत्यूपूर्वी काही दिवस, मिरज स्टेशनवर, सातारा जिल्ह्यांतल्या मागासलेल्या वर्गार्ंत दुय्यम शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी फंड जमविण्याची एक योजना दोघांनी ठरविली होती. ती अशी-
महाराजांच्या पदरीं पुष्कळ मल्ल आहेत. ते नुसते पोळांसारखे बसून असतात. महाराजांनी चार पाच जोड्यांचा खर्च चालवून त्या एका कमिटीच्या स्वाधीन कराव्या. लोकांना कुस्त्यांची आवड फार. गांवोगांव टिकीटें लाऊन मल्लांच्या कुस्त्या लढवायच्या आणि तें उत्पन्न शिक्षणप्रसारार्थ लावायचे. तात्पर्य, कोणी कितीहि छळ केला, निंदा केली, घातपात केलें, तरी भाऊराव म्हणतात, “माझें ध्येयच इतकें उच्च आहे कीं त्यापुढे या लौकीकी गोष्टी विचारांत घ्यायला माझी लहरच लागत नाही. शाहू महाराजांकडे मी दोन दृष्टीनीं पहातों. एक राज्यकर्ते शाहू महाराज व दुसरे दीनोद्धारक राजर्षि. मी दुसऱ्या दृष्टीचा उपासक आहे. पहिल्याबद्दल मी कधिं विचारच करीत नाहीं.”