साताऱ्याचे दैव का दैवाचा सतारा!
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
पहिल्या आवृत्तीविषयी
साताऱ्याचे दैव का दैवाचा सातारा!
केशव सीताराम ठाकरे
प्रबोधन लघुग्रंथ माला,
पुष्प ३ रे,
प्रबोधन मुद्रणालय, पुणे
पहिली आवृत्ती १९२५
दुसरी आवृत्ती १९३२,
दासराम बुकडेपो, कोल्हापूर
पुस्तकाची पार्श्वभूमी
प्रबोधनकारांचे सर्वात महत्त्वाचं पुस्तक कोणतं? या प्रश्नाचं बेलाशक उत्तर रंगो बापूजी यांचं चरित्र असं देता येतं. साताऱ्याच्या गादीचे शेवटचे छत्रपती प्रतापसिंह आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य पणाला लावणारे निष्ठावान सेवक रंगो बापूजी यांची अंगावर काटा आणणारी कहाणी या ग्रंथातून समोर येते. या शेकडो पानांच्या पुस्तकाच्या लिखाणाची पहिल्या पाऊलखुणा अवघ्या पन्नास साठ पानांच्या `साताऱ्याचे दैव का दैवाचा सतारा!` या पुस्तकातून मिळते. या लिखाणाची प्रेरणा छत्रपती शाहू महाराज होते.
वेदोक्त प्रकरणात छत्रपतींना शाहू महाराजांना काही सनातनी ब्राह्मणांनी फार त्रास दिला होता. तेव्हा झालेल्या चर्चेत प्रबोधनकारांनी शाहू महाराजांना सांगितलं की असा त्रास दिलेले ते पहिले छत्रपती नाहीत, तर छत्रपतींना सनातन्यांनी दिलेला त्रास हा अनेकपट जास्त होता. प्रतापसिंहांची कहाणी ऐकल्यावर त्यांचं चरित्र लिहिण्याचा आग्रह महाराजांनी प्रबोधनकारांकडे केला. त्यानंतर काही महिन्यांनी १९२२च्या शिवजयंतीला प्रबोधनकार साताऱ्यात शिवजयंतीचं भाषण द्यायला जात होते. तेव्हा पुणे स्टेशनवर त्यांना शाहू महाराज भेटले. त्या भेटीत महाराजांनी त्यांना आदेश दिला, `अरे आता कितीदा तुम्ही सोळाशे सत्तावीस साली शिवाजी जन्मला हे पालुपद गात बसणार? माझी आज्ञा आहे तुला, तेथे तो सातारच्या राज्यक्रांतीचा इतिहास इत्थंभूत सांगून, दे त्या सातारच्या मावळ्यांना भडकावून.`
महाराजांची आज्ञा प्रबोधनकारांनी शब्दशः प्रत्यक्षात उतरवला, हे वेगळं सांगायलाच नको. ब्राह्मणेतर पक्षाने तीन दिवस राजवाड्यासमोरच्या विस्तीर्ण पटांगणात प्रबोधनकारांची व्याख्याने आयोजित केली होती. त्या निमित्ताने हा इतिहास शंभर वर्षांनी पहिल्यांदाच महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आला. तेव्हा प्रबोधनकारांनी केलेलं भाषण हिंदवी स्वराज्याचा खून या शीर्षकाखाली लेख स्वरूपात पाक्षिक प्रबोधनमधे प्रकाशित झालं. त्या आसपासच याच विषयावर `साताऱ्याचे दैव का दैवाचा सतारा!` या शीर्षकाचा आणखी एक लेख प्रबोधनमधे प्रसिद्ध झाला होता. हे दोन्ही लेख १९२५ साली प्रबोधनकारांनीच पुण्यातली प्रबोधन छापखान्यामधून प्रबोधन लघूग्रंथमालेतील तिसरं पुस्तक म्हणून प्रकाशित केला. या पुस्तकाची पहिली आवृत्ती ४८ पानांची होती. त्याची पुढची आवृत्ती प्रबोधनकारांचे कोल्हापूर येथील सत्यशोधक मित्र दासराम जाधव यांनी प्रकाशित केली. त्याचा आकार लहान असल्याने ते ६१ पानांचे होते.
या छोट्या पण फार महत्त्वाच्या पुस्तकाची ही ऑनलाईन आवृत्ती आपल्याला नवा दृष्टिकोन देईल, याची खात्री वाटते. त्यासाठी तुमचे स्वागत.
सचिन परब,
संपादक, प्रबोधनकार डॉट कॉम
हिंदवी स्वराज्याचा खून
(ता. २९ एप्रिल १९२२ रोजी सातारा येथें श्रीशिवजयंत्युत्सव प्रसंगी श्री. ठाकरे यांनी दिलेले व्याख्यान.)
भगिनीबांधवहो, आज आपण पुण्यश्लोक श्रीशिवाजी महाराज ह्यांचा जन्मदिवस साजरा करण्याकरितां जमलो आहो. आजचा दिवस अत्यंत मंगल, अत्यंत पवित्र आणि स्फूर्तिदायक असा आहे. ह्या दिवशी गुलाम महाराष्ट्राला स्वतंत्र करणारा, नामर्द मऱ्हाठ्यांना मर्द बनविणारा आणि नांगरहाक्या अनाडी शेतकऱ्यांतून भीष्मार्जुनकर्णापेक्षाहि सवाई भीष्मार्जुन निर्माण करणारा राष्ट्रवीर जन्माला आला. अर्थात् अशा मंगल प्रसंगी `शिवरायास आठवावे` ह्या विषयानुरूप शिवचरित्राबद्दल मी कांहीं विवेचन करावे अशी आपली अपेक्षा असणे साहजिक आहे व तसा माझाहि उद्देश होता. परंतु पाडळीला मोटारींत बसून मी साताऱ्याकडे येऊं लागताच माझा तो बेत बदलला.
शिवरायास आठवतां आठवतां सबंध शिवशाहीचा चित्रपट माझ्या अंतश्चक्षूंसमोर भराभर फिरूं लागला; आणि सातारच्या ह्या निमकहराम स्वराज्यद्रोही राजधानींत मी येऊन दाखल होतांच, शिवाजीनें स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या अंतकाळचा भेसूर देखावा मला स्पष्ट दिसूं लागला. बांधवहो, आपण सातारकर असल्यामुळें आपल्याला सातारचा अभिमान असणें योग्य आहे. क्षमा करा, मला तितका त्याचा अभिमान नाही. सातारा ही पापभूमी आहे. सातारा ही हिंदवी स्वराज्याची ऱ्हासभूमी आहे. रायगडावर उदय पावलेल्या हिंदवी स्वराज्याचा सूर्य ह्या साताऱ्यास अस्त पावला. रायगडाला जन्माला आलेल्या स्वराज्याच्या नरडीला नख देऊन भिक्षुकशाहीनें साताऱ्यास त्या स्वराज्याचा मुडदा पाडला.
दिल्लीच्या मोंगल बादशाहीच्या सिंहासनाला गदगदा हालविणाऱ्या, इतकेच नव्हे, तर अटकेपार रूमशामच्या बादशाही तक्ताचा थरकांप उडविणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे रक्त ह्या सातारच्या पापभूमीवर सांडलेले आहे. शिवछत्रपतीच्या विश्वव्यापी मनोरथाचा ज्या भूमींत नायनाट झाला, त्याच भूमीवर उभें राहून आजच्या मंगल प्रसंगीं पुण्यश्लोक शिवरायाचें गुणगायन करण्यापेक्षां आमचें हिंदवी स्वराज्य कां नष्ट झाले, त्याच्या गळ्याला कोणकोणत्या अधमांनी नख लावले आणि भिक्षुकशाहीनें कोणकोणती घाणेरडीं कारस्थानें करून आमच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचा मुडदा या साताऱ्यांत पाडला, त्याचा आज जर आपण इतिहासाच्या आधारानें विचार केला, तर सध्यांच्या स्वराज्योन्मुख अवस्थेंत आपल्याला आपल्या कर्तव्याचीं पावलें नीट जपून टाकितां येतील.
स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असली तात्त्विक पुराणें सांगणारे टिळकानुटिळक आज पैशाला खंडीभर झाले आहेत. परंतु त्याच जन्मसिद्ध हक्कावर रखरखीत निखारे ठेवण्यास ज्या हरामखोरांची मनोदेवता महाराष्ट्रद्रोहाचा व्यभिचार करण्याच्या कामी किंचितसुद्धां शरमली नाहीं, त्याचा खराखुरा इतिहास उजेडांत आणणारे मात्र आपल्याला मुळीच भेटणार नाहींत. आज स्वराज्य शब्दाचें पीक मनमुराद आलेलें आहे. फंडगुंडांच्या पोतड्या भरण्यासाठीं स्वराज्य हा एक ठगांचा मंत्र होऊन बसला आहे. परंतु स्वराज्य म्हणजे काय याची व्याख्या मात्र कोणीच स्पष्ट करीत नाहीं. अशा प्रसंगी आपले हिंदवी स्वराज्य आपण कां गमावले, याचा नीट विचार केल्यास सध्यां महाराष्ट्रभर धुमाकूळ घालीत असलेल्या राष्ट्रीय गुंडांच्या स्वराज्यविषयक चळवळीत ब्राह्मणेतर संघाने किती जपून वागलें पाहिजे ह्याचा खुलासा तेव्हांच होईल.
राष्ट्रीयांची स्वराज्य-पुराणें म्हणजे गांवभवानीची पातिव्रत्यावरील व्याख्यानें आहेत; कारस्थानी वेदांत आहे; ठगांची ठगी आहे; स्वार्थसाधूंचा मायाजाल आहे. शिवरायास आठवावें; गोष्ट खरी! परंतु आज शिवछत्रपतीचे स्मरण होतांच त्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या ऱ्हासाचे पृथक्करण करण्याकडे आपली स्मरणशक्ति वळते, त्याला इलाज काय?
तेव्हां आपण आतां छत्रपति प्रतापसिंह महाराज यांच्या कारकीर्दीकडे वळू. प्रतापसिंह हे एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीचे करवीरकर शाहू छत्रपति होते. १८१८ साली रावबाजीचें व त्याबरोबर पुण्यांतल्या पेशवाईचें उच्चाटन पापस्मरण बाळाजीपंत नातूनीं केल्यानंतर ईस्ट इन्डिया कंपनीनें प्रतापसिंह महाराजांना त्यांच्या पूर्वजांच्या सिंहासनावर स्थापन केलें. त्यापूर्वी येथील नजिकच्या वासोटा किल्ल्यावर प्रतापसिंह महाराजांना निमकहराम कृतघ्न पेशव्यांनीं सहकुटुंब सहपरिवार अनेक वर्षे कैदेंत ठेवलेले होते. सिंहासनाधिष्ठित होतांच, महाराजांनी राजकारणाची यंत्ररचना ठाकठीक बसविल्यानंतर, ब्राह्मणेतरांच्या सामाजिक व धार्मिक उन्नतीचा प्रश्न त्यांनीं हातीं घेतला.
थोडक्यांत सांगायचें म्हणजे ब्राह्मणेतरांच्या उन्नतीचा जो प्रश्न करवीरकर छत्रपतीनीं सध्यां हातीं घेतलेला आहे, तोच प्रश्न प्रतापसिंह महाराजांनी हाती घेऊन दीनदुनियेला ब्राह्मणांच्या कारस्थानी भिक्षुकशाही बंडापासून मुक्त करण्याचा विडा उचलला. ब्राह्मणेतरांच्या अज्ञानावर मनमुराद चरण्यास सोकावलेल्या पेशव्यांच्या अभिमानी भिक्षुकांना महाराजांची ही चळवळ कशी बरें सहन होणार? ती हाणून पाडण्यासाठीं भिक्षुकशाहीनें कमरा कसल्या. त्यावेळीं या कंपूचें पुढारपण स्वीकारण्यासाठीं पुढे झालेले त्यावेळचे `लोकमान्य` म्हटले म्हणजे पापस्मरण बाळाजीपंत नातू हे होत. इंग्रजांकडून मिळणाऱ्या जहागिरीच्या लचक्याला लालचटलेल्या ज्या अधमानें स्वजातिवर्चस्वाच्या शनवारवाड्यावर इंग्रजांचा बावटा फडकवायला मागें पुढैं पाहिलें नाही, तो चांडाळ छत्रपतीच्या ब्राह्मणेतर संघाला उन्नतीचा एक श्वास देखील कसा घेऊ देईल?
असले हे लोकमान्य नातु शेंडी झटकून पुढें सरसावतांच त्यांच्या पाठीमागें चिंतामणराव सांगलीकर, बाळाजी काशी किबे, बाळंभट जोशी, बाळकोबा केळकर, नागो देवराव, भोरचे पंत सचिव, कृष्णाजी सदाशिव भिडे, सखाराम बल्लाळ महाजनी, महादेव सप्रे, भाऊ लेले, (एक मावळा : एअर इचिभन! हत बी भाऊ लेल्या?) असले हे अस्सल ब्राह्मण वीर प्रतापसिंह छत्रपतीची चळवळ आमूलाग्र उखडून टाकण्यासाठीं कमरा कसून सिद्ध झाले. परंतु ही सर्व सेना जातीची पडली ब्राह्मण, एकरकमी चित्पावन अस्सल राष्ट्रीय! तेव्हां आपल्या पक्षाला `सार्वजनिकत्व` आणण्यासाठीं बाळाजीपंतांना कांहीं आत्मद्रोही व घरभेद्या ब्राह्मणेतर पात्रांची फारच जरूर भासूं लागली. लवकरच परशुरामाच्या कृपेनें बाळाजीपंतांच्या या राष्ट्रीय चळवळींत एक बिनमोल ब्राह्मणेतर प्यादें हस्तगत झालें. तें कोणतें म्हणाल, तर खुद्द प्रतापसिंहाचे धाकटे भाऊ आप्पासाहेब भोसले. खुद्द राजघराण्यांतलाच असला अस्सल मोहोरा राष्ट्रीय चित्पावनी मंत्रांच्या जाळ्यांत सापडतांच नातूच्या राष्ट्रीय कटाला सार्वजनिकपणाचें स्वरूप तेव्हांच आलें आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या बगलेंत शिरून या राष्ट्रीय नातूकंपूनें इंग्रजांच्या हातून छत्रपतीच्या सिंहासनाचें परस्पर पावणेतेरा करण्याची आपली कारवाई सुरू केली. या कामीं त्यांनी एकदोन शंकराचार्यसुद्धा बगलेत मारले.
नातूनीं विचार केला कीं हा मरगट्टा छत्रपति ब्राह्मणेतरांत धर्मिक आणि सामाजिक जागृति करून आम्हां भूदेवांचे वर्चस्व कढीपेक्षांहि पातळ करणार काय? थांब लेका! तुझ्या सिंहासनाच्या खालींच माझ्या चित्पावनी कारस्थानाचा बांब गोळा ठेवून, कंपनी सरकारच्या हातूनच त्याचा स्फोट करवितों. मग पहातों तुझ्या ब्राह्मणेतरांच्या उन्नतीच्या गप्पा! बांधवहो, कोल्हापुरच्या श्रीशाहू छत्रपतींना `स्वराज्यद्रोही` ठरविण्याची केसरीकारांची राष्ट्रीय चतुराई आणि प्रतापसिंहाला गुप्त कटाच्या फांसांत अडकवून जिवंत गाडण्याची नातूशाही या दोनही गोष्टींचा मसाला एकाच राष्ट्रीय गिरणीचा आहे, इतके आपण लक्षांत ठेवले म्हणजे झालें. नातूकंपूत सामील झालेल्या या सर्व पंचरंगी राष्ट्रीयांनी कंपनीसरकारच्या गव्हर्नरापासून तों थेट सातारच्या रेसिडेंटापर्यंतच्या सर्व पात्रांच्या नाकांत आपल्या कारस्थानाची वेसण `खूप शर्तीने` घातली.
अर्थात सर जेम्स कारनाकपासून तों थेट रेसिडेंट कर्नल ओव्हान्सपर्यंत सगळी बाहुली लोकमान्य नातूंच्या सूत्राच्या हालचालीप्रमाणे `लेफ्ट राइट` `लेफ्ट राईट` करूं लागली. या पुढचा इतिहास अत्यंत भयंकर आणि मानवी अंतःकरणास जाळून टाकण्यासारखा आहे. परंतु तो प्रत्यक्ष घडवीत असतांना मात्र बाळाजीपंत नातू किंवा चिंतामणराव सांगलीकर ह्यांच्यापैकी एकाचेंहि अंतःकरण चुकूनसुद्धां कधीं द्रवलें नाहीं. राष्ट्रीय अंतःकरण म्हणतात तें हें असें असतें. अनुयायांची गोष्ट काय विचारावी? जेथें खुद्द आप्पासाहेब भोसले, राज्यलोभानें सख्या भावाच्या गळ्यावर सुरी फिरविण्यास सिद्ध झाला, तेथें आपल्या सदसद्विवेक बुद्धीची मुंडी पिरगळतांना इतरांना कशाची भीती?
प्रतापसिंह महाराजांनी भिक्षुकशाहीचें बंड मोडून ब्राह्मणेतरांना धार्मिक व सामाजिक स्वातंत्र्य देण्याची चळवळ हाती घेतांच, बाळाजीपंत नातूच्या उपरण्याखालीं जें राष्ट्रीय कुत्र्यांचें सार्वजनिक मंडळ जमा झालें, त्याला एवढीच कल्पना भासू नये काय, कीं आपल्या ह्या उलट्या काळजाच्या कारस्थानामुळें श्रीशिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचें सिंहासन आपण जाळून पोळून खाक करीत आहोत? महाराष्ट्राच्या मानेवर सुरी फिरवीत आहोंत? जाणूनबुजून क्षुल्लक स्वार्थासाठी फिरंगी आपल्या घरांत घुसवीत आहोत? आजला त्याच हरामखोर नातूचे सांप्रदायिक जातभाई करवीरकर छत्रपतींना `स्वराज्यद्रोही छत्रपति` म्हणून शिव्या देण्यास शरमत नाहींत. यावरून एवढेच सिद्ध होतें कीं, बाळाजीपंत नातूचा स्वराज्यद्रोही संप्रदाय अजून महाराष्ट्रांत जिवंत आहे.
आम्हांला जर स्वराज्य मिळवावयाचेंच असेल, आमचें उद्याचें स्वराज्य चिरंजीव व्हावें अशी जर तुमची इच्छा असेल, तर प्रतापसिंहाच्या वेळीं भिक्षुकशाहीने ह्या साताऱ्यांत रायगडच्या स्वराज्याचा जसा मुडदा पाडला, तसाच उद्याचे स्वराज्य मिळविण्यापूर्वी महाराष्ट्रांत शिल्लक उरलेल्या स्वराज्यद्रोही नातु संप्रदायाचा आपणांस प्रथम बीमोड केला पाहिजे. नव्हे, असें केल्याशिवाय तुम्हांला स्वराज्यच मिळणे शक्य नाहीं.
बाळाजीपंत नातूचें चरित्र भ्रूणहत्या, स्त्रीहत्या, गोहत्या, स्वराज्यहत्या आणि सत्यहत्या असल्या कल्पनातीत महापातकांनीं नुसतें बरबटलेलें आहे. अर्थात् जोपर्यंत हा नातू, किबे, केळकर ॲन्ड को. चा संप्रदाय महाराष्ट्रांतून हद्दपार होणार नाहीं तोपर्यंत आपल्याला खरेंखुरें स्वराज्य लाभणार नाहीं. ह्या संप्रदायाच्या स्वराज्यद्रोही लीला जर नीट विचारांत घेतल्या नाहींत, तर तुमच्या पदरांत पडणारें स्वराज्य म्हणजे ब्राह्मणभोजनांतल्या खरखट्या पत्रावळी हे खूप ध्यानांत ठेवा.
छत्रपति प्रतापसिंहाने ब्राह्मणेतरांची सुरू केलेली चळवळ हाणून पाडण्यासाठीं, खुद्द त्यालाच पदभ्रष्ट करून मुळांतलाच कांटा उपटण्याची बाळाजीपंत नातूच्या राष्ट्रीय कंपूची जी तयारी झाली, तिकडे आपण आतां वळू. हरप्रयत्नानें घरभेद करून फोडलेल्या आप्पासाहेब भोसल्याला ता. २४ मार्च १८३९ रोजी नातूनें रेसिदंट ओवन्सच्या चरणांवर नेऊन घातलें व त्याच्या झेंड्याखाली सर्व स्वराज्यद्रोही गुप्तकटवाल्यांची मर्कटसेना भराभर जमा केली.
कंपनी सरकारच्या गव्हर्नरापर्यंत सर्वांना प्रतापसिंहाविरुद्ध चिथावून देऊन, हा राजा इंग्रजांचें राज्य उलथून पाडण्याचा गुप्त कट करीत आहे, आम्ही सर्व पुरावा आपल्याला देतों, माबाप कुंफणी सरकारची आम्हांला पूर्ण मदत असावी असा मंत्र फुंकून रेसिदंट ओवन्सला नातूकंपूने आपले तोंड बनविलें, राजकीय बाब ओवान्सच्या मार्फत अशी पेटवून दिली, तों इकडे (अ) धर्ममार्तंड चिंतामणराव सांगलीकर यांनी वेदोक्त पुराणोक्त तंटा उपस्थित करून छत्रपतीच्या विरुद्ध, कंपनी सरकारकडे धार्मिक जुलमांबद्दल फिर्यादीच्या अर्जांचीं भेंडोळीं रवाना करण्यासाठीं आपली ब्राह्मणसेना जय्यत उभी केली.
आज ज्याप्रमाणे ब्राह्मणेतरांविरुद्ध व विशेषतः सत्यशोधकांविरुद्ध अत्याचारांच्या खोट्यानाट्या फिर्यादींची दंगल उडालेली आहे. त्याचप्रमाणे चिंतामणरावाच्या ब्राह्मणसैन्यानें आपला शंखध्वनी संप्रदाय मोठ्या नेटानें चालू केला. हे राष्ट्रीय ब्राह्मण नुसत्या कागदी अर्जाच्या कारस्थानावरच अवलंबून बसले नाहींत. निरनिराळ्या वेळीं कंपनी सरकारच्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या छावण्यांपुढे हजारों ब्राह्मणांनी जमून जाऊन प्रतापसिंहाच्या विरुद्ध धार्मिक व सामाजिक अत्याचारांची अकांडतांडवपूर्वक कोल्हेकुई करण्यास सुरुवात केली.
चिंतामणरावानें तर नातूचे व्याही कुप्रसिद्ध निळकंठ शास्त्री थत्ते यांच्या अध्वर्युत्वाखाली ब्राह्मणेतरांना विशेषतः मराठ्यांना व कायस्थ प्रभूंना `शूद्राधम चांडाळ` ठरविणारे (अ) धार्मिक ग्रंथ लिहून प्रसिद्ध करण्याची एक मोठी गिरणीच सांगलीला काढली. छत्रपतीकडून होणाऱ्या ब्राह्मणांवरील अत्याचारांच्या बनावट हकीकती जिकडे तिकडे बेसुमार पसरविण्याच्या कामगिरीनें त्या वेळच्या ब्राह्मण स्वयंसेवकांनी अद्भुत `राष्ट्रीय` कामगिरी बजाविली.
विशेष चीड येण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या शिवाजी महाराजांनी या कृतघ्न ब्राह्मणांच्या बापजाद्यांची जानवेंशेंडी रक्षण केली, त्याच शिवाजीचा अस्सल वंशज प्रतापसिंह छत्रपति हा `हिंदूच नव्हे, हा हिंदू धर्माचा वैरी आहे` अशा अर्थाचे मोठमोठे जाहीरनामे चिंतामणराव सांगलीकरानें शहरोशहरीं व खेडोखेडीं सर्व हिंदुस्थानभर फडकविण्यांत बिलकूल कमतरता केली नाही! इतकें झालें तरी नातूकंपूच्या मार्गांत एक मोठा कांटा अजून शिल्लकच होता आणि तो मात्र कसल्याहि लांचलुचपतीला बळी न पडण्याइतका भक्कम व सडेतोड होता. तो कोण म्हणाल, तर ज्याला आद्य छत्रपति शिवाजी महाराज `बाळाजी माझा प्राण आहे` असें म्हणत असत, त्या बाळप्रभु चिटणीसाचा अस्सल वंशज बळवंतराव मल्हार चिटणीस हा होय.
बळवंतराव जर आपल्या चिटणिशीवर चुकून माकून कायम राहता, तर त्याच्या चिटणिसी लेखणीच्या घोड्यांनीं नातूकंपूच्या घरादारावर गाढवांचे नांगर फिरविले असते परंतु चित्पावनी काव्याची पोंच जबरदस्त! बळवंतरावाचा पराक्रम नातू जाणून होता. चिटणीस कायम असेपर्यंत छत्रपतीचा रोमही वाकडा होणार नाही, ही त्याची पुरी खात्री होती. चिटणिशी लेखणीपुढे परशुरामाच्या वरप्रसादाची पुण्याई वांझोटी ठरणार हा अनुभव त्याच्या डोळ्यापुढे होता. म्हणून हा चिटणिशी काटा उपटण्यासाठी नातूने कर्नल ओवन्सकडून बळवंतराव चिटणीसाला एकाकी अचानक पकडून विनचौकशीनें पुण्याच्या तुरुंगांत फेकून दिले. बिनचौकशीने अटक करण्याच्या ब्रिटिश नोकरशाहीच्या पद्धतीविरुद्ध `अन्याय` `अन्याय` म्हणून कोलाहल करणाऱ्या राष्ट्रीयांनी आपल्या संप्रदायाच्या पूर्वजांचे हे हलकट कृत्य विचारांत घेण्यासारखे आहे.
चिटणिसाचा काटा अशा रीतीनें उपटल्यावर नातूचा मार्ग बिनधोक झाला. छत्रपतीच्या राजवाड्यांतील अनेक, प्रामाणिक नोकरांना पकडून, लाच देऊन, मारहाण करून, नानाप्रकारचे खोटे दस्तऐवजी पुरावे तयार केले, व रेसिडेंटापुढे खोट्या जबान्या देवविल्या. कांहीं नातूच्या कारस्थानास बळी पडले व कांहीं स्वामिनिष्ठेला स्मरून आनंदाने तुरुंगात खितपत पडले. बाळकोबा केळकर या कुबुद्धिमान गृहस्थाने बनावट सह्या शिक्के बनविण्याचे राष्ट्रीय कार्य हातीं घेतलें. प्रतापसिंह छत्रपति हा ब्राह्मणांचा भयंकर छळ करतो, या नाटकाची उठावणी चिंतामणरावानें आपलेकडे घेतली होती आणि ह्या कामी त्यांनी शंकराचार्याच्या नरडीवर सुद्धां गुडघा देऊन खोटी आज्ञापत्रें बळजबरीने लिहून घेण्यास कमी केलें नाही.
राजकारणाच्या बाबतींत छत्रपतीच्या गळ्यांत कंपनी सरकारविरुद्ध गुप्तकटाची राजद्रोहाची घोरपड लटकविण्याचे पुण्य कार्य मात्र खुद्द महात्मा नातूनीं आपल्या हातीं ठेवलें होतें. या कामीं बनावट राजद्रोही पत्रे खलिते अर्ज्या या निर्माण करण्याच्या कामीं हैबतराव व आत्माराम लक्ष्मण उर्फ अप्पा शिंदकर या दोघां ब्राह्मणेतर पात्रांना हाती धरून बाळाजी काशी किबे आपल्या कल्पकतेची कसोसी करीत होता. अखेर नातूकंपूचे सर्व कारस्थान शिजून तयार झालें. गोव्याच्या पोर्तुगीज सरकारकडे प्रतापसिंहानें गुप्त संधान बांधून त्यांच्या मदतीने इंग्रजांना हुसकून देण्याच्या बनावट कटाबद्दल कंपनी सरकारच्या गर्व्हनराची `वेदोक्त` खात्री पटली.
ब्राह्मणांच्या छळाविषयी कंपनी सरकारनें जरी कानावर हात ठेविले, ह्रकारण धार्मिक, सामाजिक बाबतींत तोंड न बुचकळण्याचा त्यांचा निश्चय जगजाहीरच-तरी पण छत्रपतीविरुद्ध स्वराज्यद्रोहाचा आरोप बळकट करण्याच्या कामीं चिंतामणरावांचा राष्ट्रीय शंखध्वनी अगदीच कांहीं फुकट गेला नाहीं. प्रतापसिंहास या सर्व गोष्टी कळत नव्हत्या, अशांतली गोष्ट नव्हती. परंतु त्या वेळीं घरभेदेपणा अतोनात माजल्यामुळें, आणि नातूच्या राष्ट्रीय पक्षाकडून फंदफितुरीचा भयंकर सुळसुळाट झाल्यामुळें महाराजांच्या आत्मविश्वासानें कच खाल्यास त्यांत नवल तें काय?
तथापि, काय वाटेल तें होवो आपण जर कोणाचे वाईट करीत नाहीं, सत्य मार्गानें जात आहोत आणि कंपनी सरकारशीं कोणत्याहि प्रकारें दुजाभावानें वागत नाही, तर माझें कोण काय वांकडें करणार? अशा प्रामाणिक समजुतीवर महाराजांनी नातूकंपूच्या वावटळीस तोंड देण्याचा निश्चय केला. चिटणीसाची अचानक उचलबांगडी झाल्यामुळें त्यांचा धीर बराच खचला. सरते शेवटीं दैवावर हवाला ठेवून सत्यासाठीं येतील ती संकटें निमूटपणे सहन करण्याचे त्यांनी ठरविले.
ता. २२ ऑगस्ट १८३९ रोजी मुंबईचे गव्हर्नर सर जेम्स कारर्नक आपल्या लवाजम्यानिशीं नातूकंपूनें शिजवून ठेवलेली गुप्त कटाची हंडी फोडण्यासाठी साताऱ्यास येऊन दाखल झाले. महाराजांना निमंत्रण जातांच दुपारीं तीन वाजतां ते त्यांच्या भेटीस गेले. त्यावेळीं त्यांचें झालेलें संभाषण सारांशानें असें होतें :
सर जेम्स : तुम्ही आमच्या विरुद्ध गुप्त कट चालविलेला आहे, आणि त्याचा सर्व पुरावा माझ्यापाशीं आहे.
महाराज : काय आपल्याविरुद्ध मी गुप्त कट केला आहे? अगदी बनावट गोष्ट! आपण या बाबतींत वाटेल तर माझी उघड चौकशी खुशाल करावी.
सर जेम्स : त्यांत काय चौकशी करायची. खऱ्या गोष्टी मला सर्व माहीत आहेत. ह्याउपर चौकशीची यातायात करण्याची आम्हाला जरूर नाहीं. आतां आपल्याला एकच मार्ग मोकळा आहे, आणि तो हाच कीं, मी सांगतो या जबानी पत्रकावर आपण मुकाट्याने सही करावी. घासाघीस करायला मला वेळ नाही.
महाराज : आपल्याला वेळ नसेल तर मी सर्व कागदपत्र ओव्हन्स साहेबाला दाखवून त्यांची खात्रीं पटवून देईन. माझ्यावरील किटाळाचा समतोल बुद्धीने उघड न्याय व्हावा हीच माझी इच्छा आहे. कंपनी सरकारशीं दुजाभावानें मी कधीही वागलो नाहीं. इंग्रज सरकारच्या मैत्रीसाठी मी विहीरींत उडी घ्यायलाहि कमी करणार नाहीं. परंतु माझ्या कल्पनेंतहि कधी न आलेल्या ज्या घाणेरड्या गोष्टी केल्याचा आरोप माझ्यावर आलेला आहे, त्याबद्दल माझा प्राण गेला तरी मी कबुली जबाब देणार नाही. सत्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर!
सर जेम्स : महाराज, मी काय म्हणतो तें मुकाट्यानें करा. त्यांत तुमचा फायदा आहे. नाहींतर तुमचें राज्य राहाणार नाहीं. हें लक्षांत ठेवा.
महाराज : मी राज्याची कधींच अपेक्षा केलेली नाहीं. इंग्रज सरकारच्या दोस्तीचा मात्र मी चाहता आहे. परंतु विनचौकशीनें घाणेरडे बनावट आरोप कबूल करून या राज्यावर राहाण्याची माझी मुळींच इच्छा नाही. तुमची इच्छा असेल तर माझे राज्याधिकार आतांच घ्या, मी खुशाल भीक मागून आपलें पोट भरीन. माझ्या चिटणिसाप्रमाणें मला उचलून तुरुंगात टाकावयाचें असेल तर खुशाल टाका. तुमच्या संत्रीच्या देखरेखीखाली मी भिक्षा मागून राहीन. आतां मी आपल्या बंगल्यावरच आहें मी येथून घरी परतच जात नाही, म्हणजे झालें! काय तुम्हांला वाटेल तें करा.
सर जेम्स : असें करूं नका. मी सांगतों याप्रमाणें या कागदावर मुकाट्यानें सही करून मोकळे व्हा. नाहींतर मला निराळी तजवीज करावी लागेल.
महाराज : तुम्हांला काय वाटेल ती तजवीज करा. ज्या गोष्टी मी केल्या नाहीत, त्या केल्या म्हणून आपल्याला लेखी जबानी देऊं काय? ही गोष्ट प्राणांतीहि होणार नाही.
प्रतापसिंह महाराजांच्या या सत्यप्रिय आणि बाणेदार वर्तनाचें स्पष्टीकरण करण्यासाठी त्या वेळीं पार्लमेंपुढैं व्याख्यान देतांना मेजर जनरल रॉबर्टमननीं जे उद्गार काढले तेच मी आपणांस सांगतो. ते म्हणाले. - The conduct of the Raja of Satara would do honour to the best days of ancient Rome, and is, in my opinion, in itself a sufficient refutation of all that has been urged against him.
(भावार्थ : प्राचीन रोमन साम्राज्याच्या नैतिक सुवर्णयुगाला साजे शोभेसेच वर्तन महाराजांनी केले व त्यांच्या सत्याग्रही तडफडीतच त्यांच्याविरूद्ध रचलेल्या बनावट किटाळांचा फोलकटपणा सिद्ध होत आहे.)
महाराजांविषयीं भिक्षुकशाहीच्या ज्वलज्जहाल द्वेषाची परिस्फुटता करतांना रॉबर्टसननीं काढलेले उद्गार चालू घटकेलासुद्धां विचार करण्यासारखे आहेत. राष्ट्रीय गुंडांच्या स्वराज्यपुराणांच्या चालू धामधुमींत ते उद्गार तुम्ही नीट मनन करा :
The Rajah had many reckless and influential enemies, and particularly that he had incurred the enmity of the Brahmins, and as it was on religious grounds that their enmity was founded, their hostility partook of all that deadly hatred which is so often mixed up in polemical disputes. I may add also, that there are no persons so unscrupulous as Brahmins when they have a Brahmanical object to carry. Everything which is likely to promote their views, however unprincipled, is then resorted to, for they think that, in such a cause the end follows the means... I believe among his many enemies, His Highness considers the Brahmin tripe as the most numerous, virulent and influential. I may state that, upon political grounds, there exists much jealousy and ill will on the part of that race to His Highness, merely because his restoration to the possession of that small share of power and importance which he now enjoys, results from the political overthrow of the Brahmin power.
(भावार्थ : राजाचे आणि ब्राह्मण लोकांचे भयंकर हाडवैर होतें. त्यांचे मूळ धर्मविषयक तंट्यांत असल्यामुळें तर भिक्षुकशाही त्याच्यावर जळजळीत आग पाखडीत असे. मी असें स्पष्ट म्हणतों की, या भटांना एकादा भटी कावा साधायचा असला म्हणजे ते काय अत्याचार व भानगडी करतील याचा नेमच नाहीं. त्यांचे बेत साधण्यासाठीं करूं नये त्या गोष्टीसुद्धां करायला ते मागेंपुढैं पहात नाहींत; कारण त्यांना पक्कें माहीत असतें कीं हेतू साध्य झाला कीं साधनांच्या बरेवाईटपणाची चौकशी होते कसली?... राजाच्या दुष्मनांत ब्राह्मणांचा नंबर अगदीं पहिला. शिवाय ते बरेच असून जितके ते राक्षसी व दुष्ट आहेत, तितकेच वजनदारही आहेत. राजकारणाच्या बाबतीतसुद्धां ब्राह्मणांचा द्वेष कमी भयंकर नाही. त्या दृष्टीनें तर ब्राह्मण लोकांच्या डोळ्यांत तो रात्रंदिवस सलत असतो. त्याचें कारण काय, तर पेशव्यांची ब्राह्मणी राजसत्ता नष्ट झाली व या राजाची थोडीबहुत राजसत्ता जिवंत राहिली, हेच.)
सन १८४० सालचे हे उद्गार चालू घटकेलासुद्धा पुण्याची राष्ट्रीय भिक्षुकशाही व कोल्हापूरचे श्री शाहु छत्रपति यांच्या झगड्यांत किती सापेक्ष रीतीनें सिद्ध होत आहेत, याचा आपणच नीट विचार करा. ह्या हिंदुस्थानांत मराठ्याचें किंवा एखाद्या ब्राह्मणेतराचें एकहि राज्य कोठें शिल्लक राहूं नये, जिकडे तिकडे सारी भटभिक्षुकशाही माजावी, ब्राह्मणेतरांवर ब्राह्मणांची सनातन कुर्रघोडी असावी ह्यासाठी ह्या राष्ट्रीय गुंडांची केवढी धडपड चाललेली असते, हें जर आपण जरा लक्षपूर्वक विचारांत घ्याल, तर राष्ट्रीयांच्या स्वराज्याच्या गप्पा म्हणजे ब्राह्मण भोजनाच्या खरकट्या पत्रावळी असें जें मी म्हणतों, त्याचा तुम्हांला तेव्हांच उलगडा होईल.
तागडीच्या जोरावर सबंध हिंदुस्थानवर तंगड्या पसरणाऱ्या कंपनी सरकारलासुद्धां छत्रपतीसारखा पाणीदार राजा व त्याचें संस्थान शिल्लक ठेवणें जिवावरच आलें होतें. तशांत स्वदेशांतलेच ब्राह्मण लोक जर एकमुखाने स्वदेशी राजाला जिवंत गाडण्याची चळवळ करीत आहेत तर त्या चळवळीचा फायदा घेऊन परस्पर पावणे तेरा या न्यायानें नातूकंपूने शिजविलेल्या बनावट राजद्रोहाच्या हंडीने छत्रपतीचा कपाळमोक्ष होत असल्यास कंपनी सरकारला तें हवेंच होतें. म्हणजे आपला स्वार्थ साधण्यासाठीं नातूकंपूनें कंपनी सरकारला व कंपनी सरकारने नातूकंपूला परस्पर मिठ्या मारण्यांत व्यभिचारी राजकारणाचें बेमालूम डावपेंच दोघेही खेळले, हाच इतिहासाचा पुरावा आहे.
कंपनी सरकार आपलें कांहीं ऐकत नाही, न्यायाचा प्रश्नसुद्धां तें विचारात घेत नाहीं, उलट हरामखोर ब्राह्मणांच्या पूर्ण पचनी पडून पदभ्रष्ट करण्याच्या धमक्या देत आहेत, अशा परिस्थितींत केवळ सत्यावर भरंवसा ठेऊन, परमेश्वरी इच्छेच्या हातांत आपल्या दैवाचा झोला सोडून, प्रतापसिंहानें निःशस्त्र सत्याग्रह करण्याचे ठरविलें. कंपनी सरकारच्या सैन्यबळापुढैं छत्रपतीचें सैन्यबळ जरी कांहींच नव्हतें, तरी छत्रपतीच्या तक्तासाठीं रक्ताचा थेंब न् थेब खर्ची घालणारे मावळे-मराठे व ब्राह्मणेतर लोक वेळ पडल्यास मधमाशीच्या झुंडीप्रमाणे भराभर बाहेर पडण्यास कमी करणार नाहींत, याची जाणीव कंपनी सरकारला होती.
नातूनें सुद्धा छत्रपतीचें उच्चाटण करण्यासाठीं इंग्रजी सैन्याची जय्यत तयारी करण्याचा मंत्र रेसिडेंट ओव्हन्सच्या कानांत फुंकला होता. आणि त्याप्रमाणें तोफखाना घोडेस्वार यांसह ग्रेनेडिअरची पंचविसावी पलटन ३१ आगष्ट १८३९ रोजी पुण्याहून निघून ४ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजतां साताऱ्यास येऊन थडकली. ग्रामण्याच्या तंत्रमंत्रानें, राजकारणाच्या कागदी बुजगावण्यानें किंवा मुंबईच्या गव्हर्नरच्या तोंडी धमकावणीस प्रतापसिंहाचा प्रताप जेव्हा केसभरसुद्धां डळमळला नाहीं, तेव्हा इंग्रजी सैन्याच्या हिमतीवर छत्रपतीला अचानक पकडून हद्दपार करण्याचा बळजबरीचा बेत नातूकंपूने ठरविला. या बेताची कुणकुण महाराजांना लागतांच त्यांनीं त्या जय्यत तयारीला तोंडघशी पाडण्याचा निश्चय केला. त्यांनीं विचार केली की, जर मी सर्वस्वी निष्कलंक आहे, तर कंपनी सरकारच्या सशस्त्र प्रतिकाराची मी कशाला पर्वा ठेवू?
ज्यांनीं आपल्या न्यायबुद्धीचाच खून पाडलेला आहे; सांगलीकर, नातू, किब्यासारख्या स्वराज्यद्रोही हरामखोरांना जहागिरींचा मलिदा चारून माझ्या विरुद्ध उठविलेले आहेत, त्यांनी माझ्यावर शस्त्र चालवून माझा घात केला, तर त्यांत काय आश्चर्य? ताबडतोब महाराजांनी सेनापती बाळासाहेब राजे भोसले यांच्याकडून स्वतःच्या सैन्याची कवाईत करविली, आणि आपण स्वतः सैनिकांच्या हातांतली सर्व शस्त्रे काढून घेतलीं. बाळासाहेब सेनापतीच्या कमरेची समशेर काढून घेऊन त्याला निःशस्त्र केले. राजवाड्यांतल्या पटांगणांतल्या सर्व तोफांतील दारू काढून त्या पाण्याने धुऊन रिकाम्या केल्या आणि सर्व सातारा शहरभर निःशस्त्र सत्याग्रहाचा जाहीरनामा पुकारला.
प्रजाजनांना गळ्याची शपथ घालून महाराजांनीं असें विनविलें कीं आज रोजी कंपनीसरकारच्या गोऱ्या सोजिरांनी जरी तुमची घरेंदारें लुटली तरीं कोणीही आपला हात वर करतांकामा नये. बांधवहो, निःशस्त्र सत्याग्रहाची मोहीम महात्मा गांधींच्याही पूर्वी ८३ वर्षे आपल्या प्रतापसिंह छत्रपतींनी एक वेळ या खुद्द साताऱ्यांत आणि तोही अशा काळांत की हूं म्हणतांच कंपनीच्या साथीदारांची व सैन्याची एकजात कत्तल करण्याची धमक मावळ्यांच्या मनगटांत रसरसत होती, अशा स्थितीत शक्य करून दाखविली, हें ऐकून ज्या अंतःकरणांत कौतुकाचा व अभिमानाचा दर्या खळवळणार नाही, ते अंतःकरण मर्द मावळ्याचे नसून कारस्थानी भटाचेंच असले पाहिजे.
ता. ४ सप्टेंबर १८३९ची संध्याकाळ झाली. आज बाळाजीपंत नातूच्या कारस्थानामुळें, सातारच्या राजधानीत शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा भर मध्यरात्री मुर्दा पडणार, या कल्पनेनें अस्तास जाणारा सूर्यनारायण रक्ताचे अश्रू टपटपा गाळीत रक्तबंबाळ होऊन सह्याद्रीच्या शिखराआड नष्ट झाला. स्वराज्यद्रोही आप्पा साहेब भोसला आणि महाराष्ट्राच्या मानेवर सुरी फिरविणारा कसाब बाळाजीपंत नातू ह्या दोघांच्या आधिपत्याखाली गोन्यासोजिरांच्या पलटणी सातारा शहराची सर्व नाकीं अडवून उभ्या राहिल्या. रेसिडेंट ओव्हन्स साहेबांची अश्वारूढ स्वारी इकडून तिकडे भराऱ्या मारू लागली. पण साताऱ्यांत त्या वेळी काय होते? जिकडे तिकडे सत्याग्रह! शुद्ध स्मशानशांतता! प्रतिकाराची उलट सलामी छत्रपति देतील, ही नातूची कल्पना फोल ठरली. प्रजाजनांनी आपापली भोजनें उरकून यथास्थितपणे निद्रेची तयारी केली. खुद छत्रपति भोजनोत्तर आपल्या महालांत खुशाल झोंपी गेले.
निष्कलंक मनोवृत्तीला निद्रादेवी बिचकत नाही, याचे प्रत्यंतर येथें दिसलें, शनिवार वाड्यावर झेंडे फडकविणारे राष्ट्रीय पक्षाचे ब्राह्मण वीर लोकमान्य नातू मध्यरात्रीच्या सुमारास ओव्हन्सच्या कानाला लागले. राजवाड्याला सोजिरांचा गराडा पडला. घरभेद्या आप्पासाहेब पुढैं, पाठीमागें रेसिडेंट ओव्हन्स आणि चार पांच गोरे सोजीर, अशी ही चांडाळ चौकडी, आज आपण ज्या राजवाड्यासमोर जमलेले आहोत त्या राजवाड्याच्या छातीतला प्राण हरण करण्याकरिता यमदूताप्रमाणे आंत घुसलें. त्यांनी देवघराचे पावित्र्य पाहिलें नाही. त्यांनी झनान्यांतील राजस्त्रियांच्या अब्रूकडे पाहिलें नाही. ते खाडखाड बूट आपटीत छत्रपतीच्या शयनमंदिराकडे गेले. आप्पासाहेबांनी `हे आमचे दादा!` असें बोट करून दाखवितांच त्या वेळचा महाराष्ट्राचा ओडवायर कॉल ओव्हन्स झटदिशीं पलंगाजवळ गेला आणि गाढ निद्रेत घोरत असलेल्या छत्रपतीला त्याने मनगटाला धरून खसकन पलंगावरून खाली ओढले आणि `तुम हमारे साथ चलो` असें म्हणून तो त्यांना खेचू लागला.
सत्याग्रही छत्रपति काहींहि प्रतिकार न करितां मुकाट्यानें चालू लागले. त्यावेळीं ते फक्त एक मांडचोळणा नेसलेले होते. त्याशिवाय अंगावर दुसरे काहीही वस्त्र नव्हते. छत्रपतींची अशा उघड्या बोडक्या स्थितीत उचलबांगडी झालेली पाहून झनानखान्यात हळकल्लोळ उडाला. चाकर माणसे भयभीत होऊन हातांत दिवट्या घेऊन सैरावैरा धांवपळ करू लागली. एकच आकांत उडाला. सर्व लोक निःशस्त्र, त्यांतच खुद्द छत्रपतींची सत्याग्रहाची शपथ, यामुळे कोणाचाच कांहीं उपाय चालेना.
महाराजांच्या दंडाला धरून ओव्हन्सनें त्यांना राजवाड्याबाहेर आणलें आणि तयार असलेल्या पालखीत त्यांना कोंबलें. जवळच उभे असलेल्या बाळाजीपंत नातूच्या डोळ्याचे पारणे फिटलें. परशुरामाचा वर पूर्ण झाला. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचें प्रेत भिक्षुकशाहीच्या तिरडीवर चढलेले पाहून रेसिडेंट ओव्हन्सला स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला. आप्पासाहेब भोसल्याचा घरभेदेपणा कचकाऊन फळफळला. एका मिनिटाच्या आंत सोजिरांच्या पहाऱ्याखाली सत्याग्रही छत्रपतींची पालखी चालू झाली. प्रजानन भराभर जमा होऊ लागले. मध्यरात्रीची वेळ, तरीसुद्धां सातारचा राजरस्ता नरनारींनी गजबजून गेला. आपला छत्रपती असा उघडा बोडका पकडून नेताना पाहून त्यांच्या डोळ्यांतून अश्रूचे धबधबे वाहूं लागले. पण करतात काय?
सत्याग्रहाची शपथ अक्षरक्षः पाळणें जरूर होतें. इतक्यांत कोणीं एकाने धांवत धांवत येऊन आपल्या घरांतील एक शाल आणून महाराजांच्या आंगावर घातली. सातारच्या ब्राह्मणेतर प्रजेने छत्रपतींना अखेरचा मुजरा ठोकला आणि क्रिस्ट्रॉल नांवाच्या सोजिराच्या आधिपत्याखाली पालखी साताऱ्याच्या हद्दपार झाली. इतक्यांत आप्पासाहेब भोसल्याच्या चिथावणीवरून सेनापति बाळासाहेब भोसल्याना कांहीं सोजिरांनी पकडून धांवत धांवत छत्रपतीच्या पालखीजवळ नेले व तें सेनापतीचे पार्सल धाडकन त्याच पालखीत फेंकून दिलें. बाळासाहेबानें ताडकन पालखीच्या बाहेर उडी मारली आणि त्वेषाने म्हणाला, "खबरदार, ज्या छत्रपतीच्या पायाला स्पर्श करण्याची आजपर्यंत कोणाचीहीं ताकद झाली नाहीं. त्यांच्या बरोबरीला बसून छत्रपतीच्या तक्ताची मी अवहेलना करू काय?
मी जरी निःशस्त्र असलों तरी अशाहि स्थितीत मी पांच पन्नासांना लोळवायला कमी करणार नाही हे लक्षांत ठेवा." इंग्रजांच्या लोकविश्रुत पॉलिसीप्रमाणे छत्रपतींच्या हद्दपारीचा शेवटला मुक्काम कोणालाही कळणे शक्य नव्हतें. पहिल्या दिवशी क्रिस्टॉल कंपूनें आठ मैलांची मजल मारून निंबगांवांत मुक्काम केला. त्या ठिकाणी गाई, म्हशी बांधण्याच्या गोठ्यात जेथे शेण आणि मुत्र सर्वत्र पसरलेले आहे. उंदीर, झुरळे, चिलटे, पिसवा वगैरेंचा सुळसुळाट आहे. अशा जागेत छत्रपतींना आणून बसविले; बांधवहो! या वेळची छत्रपतींच्या मनःस्थितीची आपणच कल्पना करावी हें बरें. दुसऱ्या दिवशी मागोमाग महाराजांची राणी, कन्या सौभाग्यवती गोजराबाई वगैरे कबिले येऊन दाखल झाले.
गाई म्हशींच्या गोठ्यांत हिंदूंचा बादशहा हरामखोर ब्राह्मणांच्या कारस्थानामुळे अस्ताव्यस्त स्थितीत पडलेला पाहून, राजवैभवात वाढलेल्या त्या राजस्त्रियांच्या अंतःकरणाची स्थिती काय झाली असेल, याची कल्पना करवत नाही! पण कल्पना कशाला? इतिहास कांहीं मेला नाही. राजहत्येबरोबर बाळाजीपंत नातूला भ्रूणहत्येचे पातक कमवायचे होते. त्या पातकाचा फोटोग्राफ इतिहासात उमटलेला आहे. नातूच्या वंशजांनी आणि त्याच्या स्वराज्यद्रोही राष्ट्रीय सांप्रदायिकांनी आपल्या बेचाळीस बापजाद्यांची पुण्याई जरी खर्ची घातली तरी तो ऐतिहासिक पुरावा नष्ट होणें शक्य नाहीं. आपला प्रियकर बाप, साताऱ्याचा छत्रपति, हिंदी स्वराज्याचा हिंदु बादशाहा, गाई म्हशींच्या गोठ्यांत वस्त्राशिवाय बसलेला पाहून गोजराबाईनें एक भयंकर किंकाळी फोडली व ती बेशुद्ध पडली. बांधवहो! यापुढील प्रकार अत्यंत भयंकर.
गोजराबाई आठ महिन्यांची गरोदर होती. बेशुद्ध पडताच तिचा गर्भपात झाला. चहूंकडे जंगल, वैऱ्याच्या कैदेंत माणसे सांपडलेली, अशा स्थितीत त्या बिचारीला कसलें औषध आणि कसला उपचार। दैवाची खैर, म्हणून बिचारीचा जीव तरी वाचला. येथून मुक्काम हालतांच तिकडे बाळाजीपंत नातूचे विचारयंत्र सुरू झाले. त्या महात्म्याने असा विचार केला की छत्रपतीबरोबर बाळासाहेब सेनापती असणे ही मोठी घोडचूक, चिटणीसाला असा अचानक उचलून फेकून दिला तशी बाळासाहेब सेनापतीची वासलात लावली पाहिले. नाही तर हा छत्रपती त्याच्या साहाय्याने एकादे नवीन स्वराज्य देखील निर्माण करावयाचा! म्हणून बाळाजीपंताने आपला कुळस्वामी ओव्हन्ससाहेब याच्याकडून सेनापतीला पकडण्याचे वारंट सोडलें.
वारंटातील मजकूर असा होता की साताऱ्यांत तुम्हांला लाखों रुपयांचे देणे आहे तें फेडल्याशिवाय तुम्हाला साताऱ्यांतून जाता येत नाही. हा आरोप बनावट होता हे सांगणे नकोच. तथापि दुसऱ्या मुक्कामावर वारंटाची टोळी बाहेर येतांच सेनापतीने आपल्या सेवकांच्या आंगावरील उरलेले कांहीं दागदागिने देऊन त्या शिपायांची काहीं तरी समजूत करून (कारण हे शिपाई पूर्वी सेनापतीच्या हुकमतीखाली होते व त्यांना खऱ्या गोष्टी माहीत होत्या.) त्यांना साताऱ्यास परत रवाना केलें. दर मुक्काम घोडदौडीची पायी चाल करून वाटेंत बाळासाहेब सेनापतीला आमांशाचा रोग जडला व रक्त पडू लागले. म्हणून औषधोपचारासाठीं वाटेत मुक्काम करण्याबद्दल छत्रपतींनीं क्रिस्टॉल साहेबांची नानाप्रकारें विनवणी केली. ओव्हन्स रेसिडेंट हा जसा त्या वेळचा ओडवायर होता, तसाच त्याचा साथीदार हा नराधम क्रिस्टॉल त्या वेळचा डायर म्हटला तरी चालेल. त्याने विनंतीचा अवमान करून मुक्कामाची दौड चालूच ठेवली. मात्र बाळासाहेबाला त्यानें एका स्वतंत्र मेण्यांत चालविले होते. परंतु औषधोपचाराची तर गोष्टच राहू द्या, पण बिचाऱ्याच्या नुसत्या अन्नपाण्याचीही कोणी व्यवस्था पाहिली नाहीं. अखेर एका मुक्कामावर क्रिस्टॉल साहेबांची सहज लहर लागली म्हणून मेणा उघडून पहात, तो बाळासाहेबांचे प्रेत कुजून त्याला घाण सुटलेली!
बाळासाहेबांचा मृत्यु होतांच त्यांच्या पतिपरायण पत्नीने एक दोन दिवसांतच प्राणत्याग केला. अशा रीतीनें बाळाजीपंत नातूने आपल्या ब्राह्मणी कारस्थानाच्या तिरडीवर आप्पासाहेब भोसल्याच्या हातून बांधलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मुडद्याची प्रेतयात्रा बनारसला पोचेपर्यंत वाटेत अनेक हत्या घडल्या. बनारसला महाराज छत्रपती ह्यांना तुरुंगांत ठेवले आणि अशा रीतीनें सध्यांच्या राष्ट्रीय पक्षांचे इतिहासप्रसिद्ध पूर्वज लोकमान्य बाळाजीपंत नातू, चिंतामणराव सांगलीकर वगैरे भू-देवाचे स्वराज्यद्रोही कारस्थान परशुरामाच्या कृपेने तडीस गेले.
बाळाजीपंत नातूने कंपनी सरकाराकडून जहागिन्या मिळविल्या, आप्पासाहेब भोसल्याची दिवाणगिरी मिळविली, नौबदीचे अधिकार मिळवले, बाळा जोशी नांवाच्या एका हलकट वाईकर ब्राह्मणाला त्याच्या `राष्ट्रीय` खटपटीबद्दल जहागिरी बक्षिस दिली, आणि नातूचे परात्पर गुरू रेसिडेंट ओव्हन्स साहेब ह्यांना मुंबई सरकारच्या शिफारसीवरून वार्षिक चारशें पौंडांचा जादा मलिदा सुरू झाला. सख्ख्या थोरल्या भावाच्या सर्वस्व घाताच्या रक्तांनी माखलेल्या तक्तावर आप्पासाहेब भोसल्याने १८ नोव्हेंबर १८३९ रोजी आपणास राज्याभिषेक करून घेतला आणि रात्री दीपोत्सव करण्याच्या बाबतीत स्वराज्यद्रोही ब्राह्मणांनी कसून मेहनत घेतली.
बांधवहो! स्वराज्याच्या अधःपाताचा हा इतिहास मी आपणास फारच थोडक्यांत सांगितला आहे. हा इतिहास मी लवकरच ग्रंथरूपानें बाहेर काढणार आहे; त्यावेळी स्वराज्यद्रोहाच्या रंगपटावर आणखी शेंकडों ब्राह्मण वीर महावीर आणि त्यांची असंख्य अमानुष कारस्थानें आपल्या दृष्टीला पडतील.
हा सर्व इतिहास जिवंत राखण्याचे श्रेय एका कायस्थ वीराने मिळविलेलें आहे. प्रतापसिंहावर नातू कंपूनें अनन्वित किटाळ उभारून त्यांना तुरुंगांत टाकल्यानंतर त्या अन्यायाची दाद पार्लमेंटापर्यंत पोचविण्याकरिता
हिंदवी स्वराज्याचे पहिले डेप्युटेशन
विलायतेत घेऊन जाणारा सच्चा कायस्थ बच्चा रंगो बापूजी गुप्ते हा होय. याने सतत चौदा वर्षे विलायतेत झगडून न्याय मिळविण्याचा यत्न केला. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणा, किंवा योगायोगाची गोष्ट म्हणा की ज्या दादजी नरस प्रभूनें आद्य छत्रपति शिवाजी महाराज यांच्याशी स्वराज्यस्थापनेची आणभाक केली, त्याच्याच अस्सल चौथ्या वंशजावर, त्याच हिंदवी स्वराज्याचा भिक्षुकशाहीकडून झालेल्या खुनाचा न्याय मिळविण्यासाठी विलायतेस जाण्याचा प्रसंग बाबा, हा योगायोग बिलक्षण नव्हे काय? असो. रंगो बापुजीची विलायतेची कामगिरी हा एक स्वतंत्र विषय आहे. तो आपल्याला माझ्या पुस्तकांतच पहावयाला मिळेल. इतकें सांगून मी पुरें करितों.
साताऱ्याचे दैव का दैवाचा सातारा
सातारा! एकच शब्द आणि तीनच अक्षरे. पण त्यांत किती सुखदुःखाच्या गोष्टी, आशा निराशेचा इतिहास आणि आंगावर रोमांच उभे करणाऱ्या स्फूर्तीची व हृदयविदारक कल्पनांची साठवण झालेली आहे! हिंदवी स्वराज्याच्या पुनर्घटनेचा धडाडीचा भगीरथ प्रयत्न येथेंच झाला आणि या स्वराज्याच्या बलिदानाचा भिक्षुकी यज्ञ येथेंच धडाडला. छत्रपतीच्या सार्वभौम सत्ताप्रसाराची दिव्य भक्ती येथेंच प्रथम फुरफुरली व अटकेपार गुरगुरली, आणि छत्रपति मालकाची स्वारी पेशवे नोकरांच्या कैदखान्यांत येथेंच झुरणीला लागून बेजार झाली. समाज-धर्मकारणांच्या क्षेत्रांत आज मगरूर झालेल्या व राजकारणांत साऱ्या महाराष्ट्राची स्वयंमान्य बडवेगिरी करविणाऱ्या चित्पावन बृहस्पतींच्या लौकिकाची प्राणप्रतिष्ठा येथेंच साजरी झाली, आणि चित्पावनांनी आपल्या आत्मप्रतिष्ठेखातर छत्रपतीच्या प्राणाची व सत्तेची आहुती याच नगरांत दिली.
जिंजीच्या आत्मयज्ञांत महाराष्ट्राची राष्ट्रीय इभ्रत तावून सुलाखून काढणारे पुरुषोत्तम येथेंच नांदले, आणि त्याच इभ्रतीचे हातपाय चित्पावनांनी केवळ आपल्या स्वार्थासाठी इंग्रजी डावपेचांच्या लोखंडी सुखळांत येथेंच बांधले. शिवरायाच्या नांवासाठीं तमाम हिंदुस्थानांत रक्ताचे सडे घालणारे वीर महावीर येथेंच थरारले, आणि भिक्षुकी पेशवे राहूंचें छत्रपतीला खग्रास ग्रहण लागतांच ब्राह्मणभोजनाच्या खरकट्या पत्रावळी व द्रोणांचे पर्वतप्राय खच येथेंच पडले. भित्रभित्र संस्कृत्यनुरूप महाराष्ट्रांतील यच्चावत् सर्व ब्राह्मण ब्राह्मणेत्तर जातींचा देशहितासाठीं व राष्ट्रोद्वारासाठीं याच साताऱ्यांत उद्धार झाला आणि चैनी व रंगेल शाहू छत्रपतीच्या राजविलासी मग्नतेचा फायदा घेऊन चित्पावनांनीं चित्पावनेतरांना माजी पाडण्याच्या कटाचा भिक्षुकी पाया येथेंच घातला.
हिंदूंच्या हिंदुत्व रक्षणाचे व प्रसाराचे प्रयत्न येथेंच झाले आणि ब्राह्मण ब्राह्मणेतर भेदाच्या विषवल्लीचें पुणेरी बीज प्रथम येथेंच पेरलें गेलें. गाई ब्राह्मणांच्या संरक्षणाचे प्रतिज्ञाकंकण चढविलेलें छत्रपति याच साताऱ्यांत गाजले, आणि ब्राह्मणी धर्माच्या यज्ञांत त्याच छत्रपतींना पेशव्यांनी जिवंत भाजून, टोपकरी सेनेला गोमांसाच्या मेजवान्यांनीं येथेंच संतुष्ट केलें. भट घराण्याची पेशवाई चिटणिशी कलमाच्या मखलाशींत येथेंच जन्म पावली; आणि पेशव्यांच्या मखलाशीनें चिटणिशी घराण्याची राखरांगोळी येथेंच झाली. क्षत्रिय मराठ्यांच्या दणकट क्षात्रतेजावर ब्राह्मणांच्या जानवी शेंड्यांचें रक्षण याच राजधानीनें केले; आणि अखेर त्याच ब्राह्मणांनी आपल्या जानवी शेंड्यांच्या वर्चस्वासाठीं परकी टोपकरांशीं संगनमत करून, मराठ्यादि अखिल चित्पावनेतरांना `शूद्राधम` ठरविण्यासाठीं छत्रपति प्रतापसिंहाचा गळा याच साताऱ्यांत भर मध्यान्ह रात्रीं कापला.
ब्राह्मणी विद्येला उत्तेजन देणारी वेदशाळा छत्रपतीनीं येथेंच स्थापन केली; आणि कायस्थ मराठ्यादि क्षत्रियांना शूद्र ठरविण्याचीं भिक्षुकी कारस्थानें अखेर येथेंच शिजली. विद्यासंपन्न भिक्षुकांना छत्रपतीनीं शालजोड्यांची खैरात येथेंच वाटली; आणि त्याच भिक्षुकांच्या सैतानी कारस्थानांनीं हद्दपार होणारी छत्रपतीची मूर्ती एका मांडचोळण्याशिवाय उघडी नागडी स्वराज्य स्वदेशाला येथेंच मुकली. छत्रपतींच्या पायाच्या धुळींतून पंत सचिव, पंत आमात्य, पंत प्रतिनिधि, पंत पेशवे इत्यादि भिक्षुकी पंतें येथेंच निर्माण झाली; आणि अखेर त्याच पंत संतांनीं ब्राह्मणी कारस्थानें रचून छत्रपतीला ह्याच साताऱ्यांत अखेरची धूळ चारली. रायगडला विसकटलेली स्वराज्याची घडी दैवाच्या सताऱ्याने साताऱ्यात बसवितांना छत्रपति राजाराम महाराजानीं ब्राह्मणांना आकंठ अमृतभोजन घातलें तें येथेच; आणि ब्राह्मणी वर्चस्वाचा भिक्षुकी डोला उभारण्यासाठीं छत्रपतीचा, व त्याबरोबरच हिंदवी स्वराज्याचा कंठ चरचरा चिरून ब्राह्मणांनीं ब्राह्मणेतरांचा सूड उगविला तोहि येथेंच.
ब्राह्मणांना चारलेल्या अमृताच्या मेजवान्यांचे पारणें अखेर हिंदवी स्वराज्याच्या खुनाच्या मुखशुद्धींत पार पडलें. दैवाचा सतारा फिरला, रायगड डळमळला, छत्रपति हाल हाल होऊन मोगलांच्या छावणीत ठार मारला गेला; पण महाराष्ट्रांतल्या खऱ्या राष्ट्रवीरांचा धीर सुटला नाही. त्यांनी लगबग करून कर्नाटकांत राजकारणी नाटक केलें आणि स्वराज्याच्या अकल्पनीय पुनर्घटनेनें मोगली मुत्सदेगिरीला चारी मुंड्या चीत केलें. साताऱ्याचें दैव उदयाला आलें. पण पुन्हा देवाचा सतारा फिरला आणि ४ सप्टेंबर १८३९ च्या मध्यरात्रीं बारा वाजतां छत्रपति प्रतापसिंहाच्या हद्दपारीनें साताऱ्याचें दैव फिरलें आणि भिक्षुकांच्या देशद्रोहाला, धर्मद्रोहाला आणि राष्ट्रद्रोहाला हिंदवी स्वराज्याचा अखेरचा बळी पडला.
ब्राह्मणांनी हिंदवी स्वराज्याचा खून केला.
ह्यानंतर यशवंतराव शिर्के, भगवंतराव विठ्ठल चिटणीस आणि स्वराज्यवादी रंगो बापूजी इत्यादि अनेक पुरुषोत्तमांनीं विलायतेची कायदेबाजी लढवून थकल्यावर, रंगो बापूजींने १८५७ सालीं साताऱ्याच्या फिरत्या दैवाचा सतारा पलटविण्यासाठीं स्वराज्याच्या पुनर्घटनेचा अखेरचा मऱ्हाटशाही धडाडीचा यत्न केला. पण ऐन घटकेलाच पंत सचिवाच्या घरभेदाच्या टोपकरी चापांत तो सांपडला आणि उत्तर हिंदुस्थानांत रचलेल्या व्यूहांत `मर्दानी झांशीवाली` देवी लक्ष्मी, धोंडोपंत नानासाहेब, तात्या टोपे प्रभृति वीरांना हकनाहक राष्ट्रोद्धाराच्या यत्नयज्ञांत ठार मरावे लागले. केवळ स्वार्थासाठीं राष्ट्रकार्याला आग लावण्याची ब्राह्मणी कारस्थानांची ही अखंड परंपरा पाहिली कीं विद्यमान राजकारणांत ब्राह्मणांच्या कासोट्याच्या आधारानें आत्मोद्धार साधू पाहणाऱ्या माणसांना माणूस म्हणणारा माणूस एक माथेफिरू तरी असावा, किंवा अजागळ गद्धा तरी असावा.
भिक्षुकांच्या हातलावणीनें आणि कावेबाज टोपकरांच्या मेहेरबानीनें, भावाच्या गादीवर घरभेद्या आप्पासाहेब भोसले छत्रपति म्हणून १८ नवंबर १८३९ रोजी जरी बसला, तरी साताऱ्याच्या दैवाचा सतारा एकदा उलटा फिरला तो कायम. साताऱ्याचें स्वराज्य गेले, तेव्हांच तेथल्या भोसले घराण्याचें छत्रपतित्व मेलें. या पुढचे छत्रपति म्हणजे इभ्राहीम करीमच्या हरण छापाच्या छत्र्या वापरणारे दत्तक जहागिरदार! यापेक्षां अधिक काय राहिलें आहे? आजचा सातारा म्हणजे पूर्वीच्या स्वराज्यरूपी आत्मा वावरलेल्या देहाचें नुसतें मढें आहे. स्वराज्याच्या आकांक्षा साताऱ्यात कधींच जळून खाक झाल्या आहेत. भिक्षुकी कारस्थानांच्या त्या पापभूमीवर स्वराज्याचें बीज मुळीं जीवच धरणार नाही, इतकी तेथील जमीन ब्राह्मणी तंत्रयंत्रादि मंत्रांनीं वांझोटी बनली आहे.
साताऱ्याच्या आसपास त्याच पूर्वीच्या टेकड्या आणि डोंगर आजहि आहेत. अजिंक्य तारा तोच आहे. राजवाडाहि जुनाच उभा आहे. त्यांतच जुन्या माणसांचे नवे वंशज कसे तरी कोठें रहात आहेत. पर बाह्य दृष्टीला दिसणाऱ्या या जड सृष्टींत आज कसलें चैतन्य आहे? डोंगर टेकड्यांतून आज स्वराज्याचा पडसाद उमटत नाही. त्यांवरून वाहणाऱ्या वाऱ्यांत आज कसल्याहि स्फूर्तीचा संदेश नाही. अजिंक्य तारा म्हणजे दगड मातीचा एक डोंगर. कधीं काळीं मामलतदारांचा `फास` घेऊन एकटा फेरफटका करून येण्याच्या लायकीचें जुनाट टेकाड, राजवाड्यांत तर काय, कायदेबाजी आणि कज्जेदलालीचा व्यापार भरभक्कम चालूंच आहे. समर्थांच्या त्या सज्जनगडावर अवघ्या दुर्जनांचा सुळसुळाट. कोठेहि पूर्वीच्या मऱ्हाटशाहीचा जिवंतपणा उरलेला नाहीं. खुद्द सातारा शहर सुद्धां उदास आणि ऐदी दिसतें. ज्या शहरांत अखिल महाराष्ट्राच्या राजकारणी व स्वयंनिर्णयी चैतन्याचा खून ब्राह्मणांनी पाडला, तेथें कसलें तेज आणि कसली भरभराट? आज सातारा स्वराज्याकरितां प्रसिद्ध नाहीं. साताऱ्याची प्रसिद्धी म्हणजे
सातारी पेढा व ब्राह्मणांचा वेढा
ह्यात आहे. स्वराज्याचा विध्वंस केल्या दिवसापासून सातारा जिल्ह्यांतला पवित्र ब्रह्मवृंद मारवाडी कसायाच्या धंद्यानें ब्राह्मणेतर मराठ्यांच्या अज्ञानावर पोळाप्रमाणें चरून, बराच धनकनकसंपन्न होऊन बसला आहे. इंग्रजी विद्येचा प्रसार व तदंगभूत विवेकवाद कितीहि फैलावला असला आणि पदवीधरांचें प्रमाण कितीहि वाढले असले, तरी ब्राह्मणांची भोजनाची चटक कांहीं केल्या कमी होत नाहीं. खरकट्याच्या जन्मसिद्ध स्वराज्याच्या हक्कासाठीं लढायला दरसाल किती तरी पुणेरी भिक्षुक वीर बिनचुक सज्जनगडावर जात असतात. सारांश, साताऱ्याचे दैव सध्या अशा प्रकारचें आहें. विशेष कांहीं असेल तर एवढेंच कीं पुणेरी देशभक्तांच्या तोंडाळ लेखाळपणाचा प्रतिध्वनि साताऱ्यांत बिनचुक उमटतो; इतका या दोन शहरांत भिक्षुकी एकजिनसीपणा आहे.
एखादा ऐतिहासिक पुनरावृत्तीचा दाखला कोणी मागितलाच तर पुण्याच्या बाळंभट नातूच्या `डिअरफ्रेंड खुरशेदजी मोदी`चा एक अवतार हल्लीं साताऱ्यात सार्वजनिक हितवादाच्या क्षेत्रांत लुडबूड करीत असतो. खालसांतल्या इतर सामान्य शहरापेक्षां साताऱ्याला अधिक वैशिष्ट्य कांहींच उरलेले नाहीं. तेथें स्वराज्य नाहीं, स्वराज्याची अभिमानास्पद स्फूर्ति नाहीं, छत्रपति नाहीं, कोणी नाहीं. हिंदु लोक जात्याच देवभोळे असल्यामुळें, ब्राह्मणांच्या चिथावणीनें ते वाटेल ते त्या दगडाधोंड्याचा देव बनवून त्याच्या भजनानंदांत पृथ्वीवर स्वर्ग उतरल्याच्या कल्पनेंत तल्लीन होतात. असल्या क्षणिक तल्लीनतेंत त्यांना असेंहि वाटतें कीं साताऱ्याचे दैव उदयाला आले!
तीन चार महिन्यापूर्वी सातारचे श्रीमंत भाऊसाहेब महाराज भोसले दिवंगत झाले. ते निपुत्रिक वारल्यामुळें त्यांच्या राणीनें एक अल्पवयी मुलगा दत्तक घेतला. या दत्तविधानाचा इतका मोठ्या थाटाचा समारंभ सातारा शहरांत झाला की `गेल्या १०० वर्षांत असोत थाट साताऱ्यांत कोणी पाहिला नाही` असें विश्वसनीय लोकमत आहे. बहुजनसमाजाचा आनंद तर वर्णनीय होता. ब्राह्मणांपेक्षां ब्राह्मणेतरांची दाटी अर्थात् विलक्षण दांडगी होती. भोळी बिचारी रयत! त्यांना घटकाभर स्वराज्याचा व छत्रपतीच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचाच भास होऊन, साताऱ्याचें दैव पुन्हा उदयास आलें असें वाटू लागलें. ब्राह्मणी कारवाईला छत्रपति प्रतापसिंहाचा बळी पडून त्याच्या गादीवर घरभेद्या आप्पासाहेब भोसला बसला.
त्या वेळच्या राज्याभिषेकाच्या सुतकी थाटानंतर आज ८६ वर्षांनी साताऱ्यानें हा दत्तविधानानिमित्त केलेला भव्य समारंभ पाहिला. मग आनंदाला काय पारावार? पण हा आनंद क्षणिक आहे. नुसत्या समारंभप्रियतेचा परिणाम आहे. एक शतकपर्यंत दडपून पडलेल्या स्वातंत्र्याच्या उत्कृष्ट भावनांची ही उसाळी आहे. छत्रपतीच्या तक्ताबद्दल महाराष्ट्रियांच्या नसानसांत फुरफुरणाऱ्या निर्व्याज व निष्कलंक प्रेमाचा हा उमाळा आहे. आपलेपणाच्या तेखदार रक्ताचा हा सणसणाट आहे. पण त्या उसाळीचा आणि उमाळ्याचा आज काय उपयोग आहे? उत्पद्यंते विलीयन्तेच दरिद्राणां मनोरथाः पैकींच सारा प्रकार. मानवांची समारंभप्रियता असल्या एखाद्या विशिष्ठ प्रसंगी आपल्या भावनांना मनसोक्त विहारासाठीं मोकळे सोडते; पण तेवढा समारंभ झाल्या नंतर पुढें काय? तात्पुरता आनंद, त्याची तात्पुरतीच फलश्रुति.
आज सातारा हें स्वतंत्र संस्थान नाहीं. तेथें स्वराज्य नाहीं, आणि छत्रपतीहि नाहीं अर्थात् दत्तविधानानिमित्त परवां तेथें झालेल्या भव्य समारंभांत, हत्तीवरल्या मिरवणुकींत आणि त्या नाटकी दरबारांत, भिक्षुकी कारस्थानामुळें पलथें पडलेलें साताऱ्याचें दैव यत्किंचितहि उलटें सुलटें होण्याचा संभव नाहीं. दगडा धोंड्यांना शेंदूर फासून त्यांना देवकळा आणण्यांत पटाईत असलेल्या हिंदुजनांना, केवळ आपल्या भावनांच्या खुषीसाठीं, वाटेल त्या व्यक्तीपुढें `छत्रपति महाराज-सरकार-मायबाप` म्हणून लोटांगणें घालण्यास कांहींच अडचण पडत नसते. पण या नुसत्या लोटांगणांनीं स्वराज्य किंवा छत्रपति निर्माण होते तर पृथ्वीचा स्वर्ग व्हायला कांहींच अवधि लागता ना. सारांश, परवा साताऱ्यास झालेल्या दत्तविधान समारंभानें साताऱ्याच्या दैवात जरी कांहीं फेरबदल झाला नाहीं, तरी दत्तक बसलेल्या भाग्यवान मुलाच्या दैवाचा सतारा मात्र कुतूहल उत्पन्न करण्यासारखा आहे खास.
इतिहासाकडे पाहिलें तर असें दिसून येतें कीं शिव छत्रपतींचा वंश म्हणजे दत्तविधानाच्या बाबतींत अनेक व्यक्तींना दैवाचा सतारा ठरलेला आहे. या वंशांतील कांहीं दत्तविधानें राजकारणी बळजबरीचीं झालीं तर कांहीं वाडीबंदरच्या एखाद्या भिवबा पांडबाला घोड्याच्या शर्यतींत लाख रुपयांचें टिकीट लागण्यासारखी झालीं. नुसत्या अस्सल रक्ताच्या भांडवलाचाच विचार केला तर कित्येक भोसले जे एकदां परिस्थितीच्या प्रवाहांत वहात अज्ञात कोपऱ्यांत पडले ते पडले आणि भलतेच घराणेवाले भोसले बनले. साताऱ्याच्या शाहू छत्रपतीनंतर जेवढे दत्तविधानी छत्रपति गादीवर आले, त्यांच्या शेळपटपणाला हा दत्तविधानी दैवाचा सताराच मूळ कारण झालेला आहे. शाहू छत्रपति करवीरकरासारख्या अचाट बुद्धिमत्तेच्या एक दोन व्यक्ति बाद केल्या, तर बाकीचे सर्व छत्रपति म्हणजे दैवाच्या झोल्यांत हेलकावे खाणारे व भोसल्यांचा वंश कसा तरी आडनांवी पुण्याईवर पुढें चालविणारे प्राणी होते, यापेक्षां अधिक कांहीं नाहीं.
कै. भाऊसाहेब महाराज सुद्धां याच पंक्तीतले. अलीकडे एक दोन ठळक प्रसंगी पुण्यांतल्या भिक्षुकी पत्रकारांनी त्यांना छत्रपति छत्रपति म्हणून जे विशेष उचलून धरले होते, ते साताऱ्याच्या किंवा छत्रपतीच्या घराण्याच्या अभिमानानें नसून केवळ ब्राह्मणेतर पक्षाच्या चुरशीनें होय. ब्राह्मणेतरांनी करवीरकर खऱ्याखुऱ्या स्वयंशासित छत्रपतीला आपला पुढारी मानला, तर भिक्षुकांनी तोडीस तोड म्हणून साताऱ्याच्या सांदीतला छत्रपति उजाळा देऊन पुढे मांडला. ब्राह्मणेतरांचें कोल्हापुर, तर भिक्षुकांचा सातारा, ही चुरस कांहीं आजकालची नाहीं. फरक एवढाच कीं सातारचा छत्रविरहित छत्रपति भटांचा गुलाम असतो आणि करवीरचा छत्रपति भटांनी गुलाम बनविलेल्या कोट्यवधि मूक रयतेच्या हृदयावर स्वयंनिर्णयी आत्मोद्धाराचें छत्र धरून त्यांना स्वावलंबनाच्या चैतन्यांत रंगवून सोडतो. सातारच्या भोसले घराण्याबद्दल भिक्षुकी प्रेमचा लोंढा केवढा गिरसप्पी आहे, हें कांहीं नव्यानें कोणाला सांगणे नको. पण कै. भाऊसाहेब व त्यांच्या आसपास असणारी कारस्थानी कुत्रीं माकडें जात्याच भटांची पायचाटी करणारी असल्यामुळें, भिक्षुकी छावण्यांत भाऊसाहेब महाराजांचा बोलबाला दक्षिणेच्या भरती ओहटीप्रमाणे कमी अधिक घुमत असे, त्यांत कांहीं नवल नाहीं.
कै. भाऊसाहेब भोसल्यांनी दत्तकाच्या पसंतीसाठी अनेक तरुणांना आपल्याजवळ ठेऊन घेतले, त्यांची तैनात चालविली, पण अखेर दत्तविधान न होतांच ते दिवंगत झाले. ह्या पांच सहा तरुणांनी कै. भाऊसाहेबांच्या हयातीत खाण्यापिण्याची खूप मजा मारली, पण बेट्यांचे दैव तितकेंच. समर्थ रामदासांच्या ब्रह्मचर्याचा चक्रवाढी सूड एकामागून एक अशा सात बायका करून घेणाऱ्या चाफळ मठाधिशाच्या मांडीवर दरबारांत बसण्याचें त्यांचें भाग्य नव्हते. त्यांच्या उलट्या अंबारीच्या नशिबाच्या कवटींत अंबारीचा हत्ती नव्हता. हा दैवाचा सतारा साताऱ्यांतहि नव्हता. तो भाटघरच्या धरणावर भिरभिरत होता. तो जलमंदिरांत आपल्या आयुष्याचे दिवस मोजीत पडलेल्या भाऊसाहेब भोसल्यांच्या निर्णयांत नव्हता, तो भाटघर धरणावर पोटासाठीं राबणाऱ्या मजुरांच्या झोपड्या झोपड्यांतून भटकत होता.
त्या दैवाच्या साताऱ्याची छाया सातारच्या राजवाड्यांतल्या मिष्ठान्नावर नव्हती, ती हातावर मिळवून तळहातावर खाल्ल्या जाणाऱ्या कदन्नावर होती. ती दत्तविधानाच्या उमेदवारीवर नव्हती, ती कल्पनेलाहि चकविणाऱ्या अकस्मातांत लपलेली होती. हा दैवाचा सतारा `प्लकी` नव्हता, `लकी` होता. तो तारुण्यावर भाळणारा नव्हता, तो एका बालमूर्तीवर मल्हारराव होळकराच्या मस्तकावरील नागाच्या फडेप्रमाणें डुलत होता, तो नुसता वंशाला `आधार` शोधीत नव्हता, तर भोसल्यांच्या औरस बीजाला व अस्सल रक्ताला धुंडीत होता. हें रक्त यज्ञात दशेच्या कवचाखालीं दडलें होतें. हें बीज दारिद्र्याच्या उकीरड्यांत गाडून पडलें होतें. राजवैभवी कल्पनेला तें पूर्ण पारखें झालें होतें. परिस्थितीच्या दणक्यांनी त्याचा भूतकाल अंधःकारमय बनला होता, आणि त्याला भविष्यकाळ तर मुळींच माहीत नव्हता. वर्तमानकाळांत ‘भोसले` या आडनांवापलीकडे त्याला कशाचीही दाद नव्हती. मागें पुढें अंधार व दृष्टीपुढें दारिद्र्य, यापलीकडे जगाची कसलीच कल्पना नव्हती.
कांहीं र-ट-फ शिकणें झाले तर शिकावें, नाही तर दणकट मनगटाची मजुरी करून पोट भरावें, यापेक्षां अधिक कसल्याहि महत्त्वाकांक्षेची पुसटसुद्धां ओळख त्याला नव्हती. साताऱ्याच्या दैवाच्या जरी ठिकऱ्या ठिकऱ्या उडालेल्या असल्या तरी ह्या बालमूर्तीच्या दैवाचा सतारा मात्र मोठा जबर. बापाची सारी हयात भाटघर धरणाच्या स्टोअर्स खात्यांत मजुरी करण्यांत गेली, तरी मुलाच्या दैवानें त्याच्या कोंड्याच्या भाकरीचा मांडा झाला. दुपारी बारा वाजलें म्हणजे आईनें बांधून दिलेली झुणका भाकरीची शिदोरी बापाला नेऊन पोहोंचविणारा गरीब `चंदऱ्या` सातारच्या भोसले घराण्याचा श्रीमंत सरदार होणार हें खुद्द आईबापालाच उमगलें नाही, तर इतरांची तरी काय कल्पना असणार? भाऊसाहेब भोसले जिवंत असतांना जरी हा मुलगा त्यांच्यापुढे उभा केला असता, तरी त्याच्या बाह्य वेषानें त्यांच्या मनांत निवडणुकीची प्रेरणा झालीच असती, असें सांगता येणार नाहीं.
दैवाचा सतारा आपल्या ठराविक घाटणीनेंच परिपक्व होत असतो. जेथें ज्योतिषी बुवांचीं अक्कलच लोळपाटणी खातें तेथें कुंडलींतल्या ग्रहांचीं गृहें परळ महालक्ष्मीच्या सिमेंट चाळीप्रमाणे बिनचुक ओसाड पडलेली दिसल्यास त्यात नवल नाहीं. ज्याच्या जन्मापासून आज सात वर्षे जगाने ज्या मुलाची कसलीच दाद घेतली नाहीं, तोच मुलगा एकदम श्रीमंत शाहू महाराज भोसले म्हणून सातारा शहरात हत्तीवर मिरविला जातो, हा चमत्कार `भविष्य` म्हणून वर्तविणारा एकहि ज्योतिषी महाराष्ट्रांत जिवंत आढळू नये, हे दैववाद्यांचे दैव का ज्योतिषशास्त्राचा फोलकटपणा?
आकाशस्थ रेवतीवर दृक्प्रत्ययी नरबाजीचे डोळे मारणाऱ्या कुंडलीबहाद्दरांनी आतांतरी जागे होऊन ह्या दैवाच्या सताऱ्यानें साताऱ्याचें दैव उदयास येईल कीं नाहीं, याचे फलज्योतिष वर्तविण्याची लगबग करावी. नाही तर भविष्यानें भूताचीं पाटलुण चढविल्यावर वर्तमानकाळाच्या पेशवाई झग्यांत ठोकताळ्याचे ढेकूण शोधण्याचा तडफडाट जगाच्या उपहासाला मात्र पात्र होईल, हे या पंचांगपंडितांना सांगितलेंच पाहिजे काय?
सात वर्षाचा चंद्रसेन भोसला केवळ आपल्या नसांतल्या रक्ताच्या पुण्याईवर सातारच्या जहागिरीचा श्रीमंत जहागिरदार झाला. या अकल्प्य घटनेचा सातारच्या जनतेला कल्पनांतीत आनंद वाटला आणि तो तिने न भूतो न भविष्यति अशा थाटानें व्यक्तहि केला. दत्तविधान, दरबार, हत्तीवरील मिरवणूक वगैरे समारंभांनी सातारा राजधानीचा आनंद गगनात मावेना. त्यातच ब्रिटिश सरकारने या सर्व कृत्यांना आपली सार्वभौमी सहानुभूती दाखविल्यामुळें तर ह्या आनंदाला पारावरच उरला नाही. पण हा आनंद अपूर्ण आहे. हा आनंद खेदमिश्रित आहे. या आनंदात निराशेच्या वेदना आहेत. हा आनंदी वर्तमानकाळ दुःखमय भूतकाळांतील अनेक दुर्दैवी घटनांनी व्यथित झालेला आहे. आनंदाच्या ह्या विरळ आवरणाखाली अनेक राष्ट्रद्रोही कारस्थानांची पिशाच्चे नंगानाच घालीत असलेली अजूनही आपल्याला दिसतात. या आनंदाच्या देखाव्याचा पार्श्वभाग काळा कुट्ट असल्यामुळें विरोधाभासानें त्याची रुची विद्यमान सातारकरांना अमृतापेक्षाही जरी गोड वाटत असली, तरी त्या रुचींत मिसळलेला आत्मद्रोहाच्या जहराचा फणफणाट अजूनही विचारवंतांच्या विचारांत विलक्षण खळबळाट उडवीत आहे.
चिरंजीव शाहू महाराज भोसले आज ज्या गादीवर दैवाच्या साताऱ्यानें अधिष्ठित झाले आहेत, त्याच गादीवरून प्रतापसिंह छत्रपतीला ४ सप्टेंबर १८३९ रोजी रात्री भर १२ वाजतां उघड्या नागड्या स्थितीत हद्दपार व्हावें लागलें आहे, ही गोष्ट नजरे आड केली तरी हृदयफलकावरून पुसून टाकतां येत नाही. ही गादी महाराष्ट्राच्या अनुपमेय स्वार्थत्यागावर राजाराम छत्रपतींच्या हस्ते जरी स्थापन झालेली आहे, तरी तिच्यावरील प्रत्येक छत्रपति पेशव्यांच्या भिक्षुकी कारस्थानाला बळी पडलेला आहे, ही गोष्ट विद्यमान मातुश्री ताराबाईसाहेब यांनी विसरून भागावयाचे नाही: सातारच्या गादीला भिक्षुकी वर्चस्वाचें कायमचें ग्रहण न लागतें तर मुंबईच्या टोपकर बनिया कंपनीला प्रतापसिंह छत्रपतीच्या आंगाला हात लावण्याची काय छाती होती?
ज्या मराठ्यांनी जिंजीचे राजकारण लढवून औरंगजेबासारख्या कर्दनकाळ दैत्याची मुत्सदेगिरी आणि लष्करी डावपेच, डोळ्याचे पाते लवते न लवतें तोंच ठेचून जमीनदोस्त केले, तेच मराठे वीर आपल्या छत्रपतीला पापस्मरण बाळाजीपंत नातू आणि कर्नल ओव्हान्स ह्यांनी दंडाला धरून तक्तावरून खेचून हद्दपार करतांना नामर्द हिजड्याप्रमाणें स्वस्थ कसे आणि का बसले? त्यांच्या तलवारीची पातीं आणि भाल्यांचीं फाळें एकदम अवचित बोथट का पडली? त्रिखंडविश्रुत मराठ्यांचा दरारा त्याच काळरात्रीं कमकुवत कसा झाला? या प्रश्नांची उत्तरें ताराबाई मासाहेब, आपण आपल्या हृदयाला विचारा, म्हणजे आपल्या युवराजाच्या देवाचा सतारा यापुढें कोणत्या शिस्तीनें वळविला पाहिजे याची आपल्याला पूर्ण जाणीव होईल. आजहि आपल्या भोंवती स्वार्थी लाळघोट्या कारस्थान्यांचा गराडा पडलेला आहे. त्यांच्या कारवाईची योग्य वेळीच वाट लावली नाहीं, तर आपल्या युवराजाच्या दैवाच्या सताऱ्याची वाट उरल्यासारखीच म्हणावी लागेल.
भिक्षुकी वर्चस्वाचें जंतर मंतर आपल्या काळजाला आरपार भिनून तें जर थंडगार पडले असेल, तर ज्या तक्तावर आज आपण एका भाग्यवान युवराजाची स्थापना केली आहे, त्या तक्तापुढे येत्या ४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री आपण शांत चित्तानें चिंतन करीत बसा म्हणजे त्या तक्ताच्या हृदयांतून पिळवटून बाहेर पडणाऱ्या रक्ताच्या चिळकांड्या आपल्या व आपल्या युवराजाच्या वास्तविक स्थितीची आपणांस पूर्ण कल्पना करून देतील, वेशासंपत्र आप्पासाहेब सांगलीकर आणि चित्पावन आयागो बाळाजीपंत नातू ह्यांच्या उलट्या काळजाच्या धर्मकारणाला आपल्या ऊर्ध्वमुखी राजकारणाची फोडणी देऊन बनिया कंपनीनें त्या तक्ताला दिलेला भडाग्नी जड सृष्टींत आपल्या लौकिकी डोळ्यांना जरी दिसत नसला, किंवा आपल्या पूज्यपतीच्या गादीखाली तो भासत नसला, तरी तो विझवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हृदयांत चिरकाल विराजमान झालेल्या शिवछत्रपतीच्या शिवतक्ताच्या पुनरुज्जीवनासाठीं, एक दोन नव्हे तर सतत १४ वर्षे विलायतेस रंगो बापूजीनें लढविलेला प्राणांतिक झगडा, आणि सरते शेवटीं सत्तावन साली मऱ्हाठशाहीनें अवघ्या हिंदुस्थानाला पाठीशीं घालून दिल्लीच्या समरांगणावर केलेला अखेरचा मर्दानी थैमान ह्याचा चित्तवेधक, स्फूर्तिदायक परंतु हृदयाचें पाणी पाणी करणारा खेदजनक इतिहास तें तक्त आपणांला, मासाहेब मोठ्या आवेशानें खास खास कथन करील.
ज्या तक्तावर चिरंजीव शाहूमहाराज आपल्या दैवाच्या सताऱ्यानें बसले आहेत, त्या तक्ताखालीं ब्राह्मणेतरांच्या सर्वांगीण प्रबोधनाचा प्रश्न अर्धवट मेल्या स्थितींत कण्हतकुंथत पडलेला आहे. त्या तक्ताच्या खालीं प्रतापसिंहाच्या सत्याग्रहाच्या धडाडीबरोबरच भोसले घराण्यांतल्या राजस्त्रियांच्या किंकाळ्या आपल्याला अजून ऐकूं येतील. त्या तक्ताच्या खालीं ब्राह्मणांच्या राष्ट्रद्रोहाबरोबर आप्पासाहेब भोसल्याचा घरभेद, आप्पा शिंदकराचा हारामखोरपणा, तात्या केळकराचे खोटे शिक्के, नागोदेवरावची भिकी सोनारीण, भोरचे पंतसचीव वगैरे अनेक वीररत्नांच्या कारस्थानांचे देखावे, ताराबाई साहेब, आपल्याला त्या रात्रीं स्पष्ट दिसूं लागतील.
छत्रपतीच्या तक्ताला पेशवाई वळणाचें भिक्षुकी ग्रहण कसें लागलें, ब्राह्मण ब्राह्मणेतर वादामुळें अभिमाना ऐवजीं स्वदेशद्रोहाचें बाळकडू मऱ्हाठे कसे प्याले आणि कायदेबाजीच्या सबबीवर बनिया कंपनीनें सातारच्या पूज्य छत्राचें तीन तेरा आपल्याच लोकांच्या हातून कसे वाजविले, ह्या सर्व गोष्टीचा आपण नीट मननपूर्वक अभ्यास केला. आणि त्या दिशेनें युवराजाच्या आत्मप्रबोधनाचा मार्ग आखलांत, तर केवळ काकतालीय न्यायानें घडून आलेल्या आपल्या चिरंजीवांच्या दैवाच्या सताऱ्याबरोबरच साताऱ्याचें दैवसुद्धां उदयास येण्याची आशा अजून नष्ट झाली नाहीं, असें आशाखोर मानवी मनाला वाटत असल्यास तो आशावाद खात्रीनें निंद्य गणला जाणार नाहीं, अशी आम्हाला आशा आहे.
इतिहास कसाही उलट सुलट वाचला आणि राजकारणाची तंगडी कशीही उलथापालथी करून चोखाळली तरी एक गोष्ट निर्विवाद आहे कीं, अवघा महाराष्ट्र सातारा राजधानीकडे कांहीं एका वर्णनीय भावनेनेंच नेहमीं पाहत असतो. आज या देवळांतला देव जरी नष्ट झाला असला तरी त्याची भिंताडें आणि रडके बुरूज ह्या देवाची आठवण त्यांच्या हृदयात क्षणोक्षणीं उचंबळवीत असतात. सातारच्या छत्रपतीच्या उच्चाटणाचें पाप जितकें स्वकीयांच्या पदराला बांधता येईल, तितकेंच ते ईस्ट इंडिया कंपनीच्या पाटलोणीलाही भिडवितां येईल. जितक्या प्रमाणांत आमचें देशबंधु या कामीं जबाबदार ठरतील, त्यापेक्षां शतपट प्रमाणांत या पापाचा वाटा ब्रिटिश सरकारच्या मूळमाया कंपनीला अर्थात ब्रिटिश राष्ट्रालाही घ्यावा लागेल.
प्रतापसिंह छत्रपतीचें उच्चाटण हा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवरला कधीही न पुसला जाणारा कलंक आहे, अशा प्रकारचे तत्कालीन ब्रिटिश मुत्सद्यांचे अभिप्राय आज कागदोपत्रीं प्रसिद्ध आहेत. हिंदु लोकांनीं राष्ट्रद्रोह केला, तर ब्रिटिशांनी अन्याय केला, असा या प्रकरणाचा सारांश निघतो. सर्वांचीच त्यावेळीं बुद्धी फिरली, म्हणून शिव छत्रपतीची सातारा राजधानी खालसा होऊन तेथील भोसल्यांना नुसत्या साध्या जहागिरीवर संतुष्ट राहण्याची वेळ आली. आज काळ बदलला आहे. फाटलेल्या मनोवृत्ति सांधण्याचा सर्वत्र प्रयत्न होत आहे. हिंदी व ब्रिटिश लोकांचे संबंध समरस करण्याचे श्लाघ्य प्रयत्न चालू आहेत.
गतेतिहासाचा कसलाहि विकल्प मनांत न आणतां, मराठे वीरांनी गेल्या महायुद्धांत ब्रिटिशांच्या अब्रूसाठीं फ्रान्सच्या समरांगणांवर सांडलेलें रक्त अजून लालबुंद चमकत आहे. अशा परिस्थितींत अखिल मराठ्यांना अमरावतीप्रमाणे प्रिय असलेली सातारा राजधानी जर ह्या नव्या मन्वंतरांत पुनश्च स्वतंत्र मऱ्हाठी संस्थानाच्या पुनरुज्जीवनाला पात्र होईल, ब्रिटिश न्यायदेवता जर साताऱ्याच्या शिवछत्रपतीच्या परमप्रिय गादीची पुनर्घटना करील, तर त्यामुळें `शिवराया प्रणिपात कराया` ब्रिटानियेनें आपल्या उद्यांच्या बादशहाला हिंदुस्थानांत पाठवून जो कृतज्ञ भाव व्यक्त केला, त्या भावनेला काहीं तरी अर्थ आहे, असें महाराष्ट्र समजेल. आज हा विचार कित्येकांना रुचणार नाहीं. अनेकांना ही कल्पित कादंबरी वाटेल. बरेच विचारवंत त्याला स्वप्न म्हणतील. परंतु जेथें जेथें खरें मर्दानी मऱ्हाटी हृदय धमधमत असेल तेथें तेथें हा साताऱ्याच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न काळजाला जाऊन भिडल्याशिवाय कधींही राहणार नाहीं, अशी आमची खात्रीं आहे.
भांबुर्ड्याच्या धोंड्यावर कसलें तरी कांहीं तरी स्मारक उभारण्यापेक्षां सातारच्या संस्थानचें जर आज पुनरुज्जीवन होईल, तर महाराष्ट्राप्रमाणेंच ब्रिटानियेलासुद्धा एका महत्पातकाचे प्रायश्चित मोठ्या आबांत घेण्याची मंगल पर्वणी प्राप्त होईल. ब्रिटिशांसारख्या सर्वसमर्थ, धूर्त व कदरबाज राष्ट्राला महाराष्ट्राची जर कांहीं कदर वाटत असेल, मराठ्यांच्या आत्मयज्ञाची त्यांना बूज राखावयाची असेल, तर तिवाठ्या खवाट्यावर दगडाधोंड्यांची स्मारकें उभारण्यापेक्षां म्हैसूर, काशी वगैरे खालसा झालेल्या काहीं संस्थानांचें जसें त्यांनी पुनरुज्जीवन केलें, तद्वत् सातारच्या छत्रपतीचें व त्यांच्या पुरातन तक्ताचें पुनरुज्जीवन केल्यास मर्द मराठ्यांच्या हृदयांत आपलेपणांची भावना जागृत केल्याचें श्रेय त्यांना खास मिळेल. ही अशक्य कोटींतील गोष्ट नव्हे. ही ब्रिटिशांना सहजशक्य गोष्ट आहे. ही न्यायाची मागणी आहे. कृतकर्माचें प्रायाश्चित्त घ्या आणि सत्याची लाज राखा, असा हा उघडाउघड सवाल आहे. रात्रंदिवस शल्याप्रमाणें हृदयांत डाचत असलेल्या अमंगल गतेतिहासाला पुनरुज्जीवनाच्या मंगल कार्यानें पावन करा, असा हा न्याय्य मागणीचा अर्ज आहे. ह्या कामीं ब्राह्मणब्राह्मणेतरांनीं एकवटून कार्याला सुरुवात केल्यास त्यांच्या पूर्वजांनीं छत्रपतीच्या उच्चाटणाचें जें दुष्कृत्य केलें त्याच्या पापापासून त्यांची मुक्तता होईल आणि सातारा ही इतर देशी संस्थानांप्रमाणे पुनरुज्जीवित अशा शिव छत्रपतीची शिवनगरी झाली, तर तो मंगल सोहाळा महाराष्ट्राला त्याचप्रमाणें ब्रिटिश लोकांना मोठ्या अभिमानाचा, सत्यप्रियतेचा आणि न्यायप्रियतेचा म्हणून भावी इतिहासांत रेडियमच्या अक्षरांनीं चिरंजीव होऊन बसेल.
साताऱ्याची शिवनगरी बनविण्यासाठीं ब्राह्मणांनों, पूर्वग्रहांना विसरून एकनिश्चयानें तुम्ही तयार व्हा; कारण तुमच्या पूर्वजांनीं केलेल्या कर्माचें प्रायश्चित्त तुम्हांला घ्यावयाचें आहे. तें ह्या उमद्या मार्गानें घ्या. यांत सारे जग तुमच्या बुद्धिमत्तेचें कौतुक करील. तुमच्या पापभीरुत्वाची इतिहास ग्वाही देईल. ब्राह्मणेतरांनों, क्षत्रिय मराठ्यांनो, तुम्हांला शिवस्मारक पाहिजे ना? मग त्या भांबुर्ड्याच्या धोंड्यावर डोकी फोडण्यापेक्षां ह्या अभिनव शिवनगरीच्या उद्धारासाठीं तुम्ही आपलीं डोकीं अवश्य चालवा. आज तुम्हांला अस्सल भोसले कुळांतला एक बालवीर दैवाच्या सताऱ्यानें साताऱ्याचें दैव गदागदा हालविण्यासाठीं अकस्मात प्राप्त झाला आहे. ह्या संधीचा फायदा घेऊन तुम्ही शिवनगरीचा जर ध्यास घ्याल आणि प्रबोधनाच्या कल्पनेंत खेळणारी ही कल्पनासृष्टी प्रत्यक्ष अस्तित्वांत आणण्याच प्रयत्न कराल, तर बंदिवासाच्या हाल अपेष्टांत काशीला मरण पावलेला प्रतापसिंह छत्रपती आणि त्यांच्या नावासाठीं व तक्तासाठीं अनुपमेय आत्मयज्ञ करणारा रंगोबापूजी ह्यांच्या स्वर्गस्थ आत्म्यांना खात्रीने संतोष वाटेल.
सरतेशेवटीं ब्रिटिश राजकर्त्यांना आमची अशी विनंति आहे कीं, साताऱ्याच्या पुनरुज्जीवनाचा हा प्रश्न आपण आतांही जर न सोडविला तर सत्य, न्याय आणि माणुसकी या तीनही तत्त्वांच्या दृष्टीनें ती एक मोठी नामुष्कीची गोष्ट होईल, असें छातीठोक विधान करण्यापुरता पुरावा गतेतिहासातूंन आम्ही लागेल तितका काढून देऊ. ब्रिटिशांना महाराष्ट्राच्या मनोभावनेची जर कांहीं दरकार असेल तर त्यांनी हा शिवनगरीचा प्रश्न अवश्य विचारांत घ्यावा. सद्दीच्या जोरावर छत्रपतींचे तहनामे रद्दी ठरविले गेले. जाऊं द्या. तत्कालीन रेसिदंटांनी गव्हर्नरांची मनें, ब्राह्मणांच्या चिथावणीनें, कलुषित केली; करूं द्या. रंगोबापूजींच्या १४ वर्षांच्या विलायती वनवासाला यश आलें नाहीं; न येऊं द्या. अनेक ब्रिटिश मुत्सद्यांची न्यायबुद्धी व सत्यप्रियता त्या वेळीं वांझोटी ठरली; ठरूं द्या. भूतकाळ मेला; मरूं द्या.
भविष्याकडे लक्ष द्या. भूतकाळाच्या भूतांना वर्तमानकाळात गति देऊन, भविष्यकाळाला उज्ज्वल करा. शिवरायाला नुसता मुजरा करूं नका; त्यांचे जिवंत स्मारक करा. प्रतापसिंह छत्रपतीची पदच्युतता म्हणजे अखिल महाराष्ट्राच्या काळजांत खोल घुसलेला आंग्रेजी जंबिया आहे. तो एक अन्याय आहे. ती एक सत्याची बेगुमान मुस्कटदाबी आहे. तो जंबिया आतां खेचून काढा. तो महाराष्ट्राचा अपमान आतां पुसून टाका. लढाईंत जिंकलेलें टिपू वाघाचें राज्य ज्या ब्रिटिश सरकारनें वडेयार हिंदू घराण्याला परत देऊन म्हैसूरचें राज्य पुनरुज्जीवित केलें; काशीच्या राज्याची पुनर्घटना केली, त्याच ब्रिटानियेला शिवरायाचें मुळ तक्त पुनरुज्जीवित करायला फारसें कठीण नाहीं. ब्रिटानिये! तुझ्यासाठीं मराठ्यांनीं आपलीं उमलती जवान पिढी युरपच्या रणयज्ञांत बळी दिली आहे, हे विसरूं नकोस. तुझ्या उद्याच्या नृपतीनें व हिंदुस्थानाच्या बादशहानें आमच्या शिवदेवापुढे टोपी काढून मुजरा केला आहे, हें लक्षांत घेऊन, सातारच्या अन्यायाचे परिमार्जन करायला ह्या वेळीं तूं तुझ्या इतिहासप्रसिद्ध न्यायबुद्धीचा उपयोग धोरणानें करशील अशी आशा आहे.