संगीत सीताशुद्धी
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
पहिल्या आवृत्तीचं पहिलं पान
जय जय रघुवीर समर्थ
सीताराम-पुस्तक-माला. पुष्प १ ले
केशव सीताराम ठाकरे कृत-
साग्रसंगीत सीताशुद्धी
नाटक
(रंगावृत्ति अंक १ ते ५)
‘‘चिरंजीव त्या अंजनी बालका ।
नसे भीति कालत्रयी आयका ।।
प्रतिकार त्या जो मदाने करी ।
अरी तो पडे सत्वरी यमकरी ।।
यशाची ध्वजा शोभते ज्या करी ।
यशवंत येईल तो लवकरी ।।
प्रकाशक
धी इंडिया पब्लिशिंग कं. लि.
५, कावसजी पटेल रोड, फोर्ट-मुंबई
सन १९०९ इसवी
प्रस्तावना
पौराणिक कालांतील कथाभाग नाटकरचनेस घेतला असतां, त्यांत नीतिदर्शक अशीं अनेक स्थळें सांपडतात आणि मनोरंजनाच्या बरोबरच नीतिचाहि बोध होण्याला तशीं नाटकें वाचकांना व प्रेक्षकांना दोघांनांहि पसंत पडतात; म्हणून माझ्या अल्पमतीनें प्रस्तुतचें सीताशुद्धी नाटक तयार करून तें मीं आज माझ्या सर्व रसिक देशबंधूंच्या पुढें ठेवीत आहे. रामायणांतील मूळ आख्यान नाटक-रचनेच्या दृष्टीनें बरेंच नियमित व आकुंचित करावें लागलें खरें, तथापि ठिकठिकाणी होतां होईल तों संदर्भ मात्र सोडला नाहीं. कांहीं प्रवेश काल्पनिक परंतु त्या काळाला अनुसरून घातले आहेत. नाटक लिहिण्याचा हा माझा प्रथमचाच यत्न आहे, तो कितपत साधला आहें हें पाहण्याचें काम मी रसिकांवर आणि टीकाकारांवरच सोंपवितों. त्यांत कांहीं गुणलेश आढळल्यास त्याचें श्रेय सर्वस्वी माझे गुरुवर्य श्रीयुत कृ. ना. आठल्ये एडीटर `केरळकोकिळट व श्रीयुत राजाराम नारायण गडकरी वकील-देवास यांना आहे.
नाटक प्रयोगाच्या दृष्टीने सुधारून लिहीत असतां श्रीयुत रा. रा. गोपाळराव हरी काशीकर-वकील यांची मला फार मदत झाली, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. शेवटीं सर्व सहायकारी मित्रमंडळाची व पुरस्कर्त्यांची मजवरची कृपादृष्टी शुक्लेंदुवत् वाढत्या प्रमाणांवर राहो अशी त्या जगन्नियंत्या प्रभूपाशीं करुणा भाकून हा प्रस्तावना लेख पूर्ण करितों.
देशबंधूचा नम्र सेवक
केशव सिताराम ठाकरे
स्व. हि. चि. नाटक मंडळी छावणी-उमरावती
ता. १ सप्टेंबर १९०९
प्रकाशकांचे उद्गार
प्रस्तुत सीताशुद्धि नाटक महाराष्ट्र वाचकवर्गापुढें ठेवतांना त्यांतील गुणास्वाद हंसक्षीर न्यायानें त्यांनीं स्वीकारावा अशी विनंती आहे. या नाटकाची रचना एकदोन नाटकमंडळ्यांच्या तालमी मुद्दाम घेऊन प्रयोग दृष्ट्या होतां होईल तों अव्यंग करून सुधारली आहे. त्यामुळें प्रयोगाची परवानगी मिळालेल्या व मिळविणाऱ्या नाटक मंडळ्यांना रंगभूमीवर प्रयोग करतांना अडचण पडणार नाहीं अशी आशा आहे. या पुस्तकासंबंधीं (प्रयोगाच्या परवानगीखेरींज) सर्व प्रकारचे हक्क आमच्या स्वाधीन आहेत. प्रयोगाची परवानगी मागणें झाल्यास केशव सिताराम ठाकरे-पनवेल, जि. कुलाबा या पत्त्यावर नाटकमंडळ्यांनीं पत्रव्यवहार करावा.
नजरचुकीनें राहिलेल्या मुद्रणदोषाबद्दल क्षमा मागून, ज्या जगदीश्वर प्रिंटिंग् प्रेसने छापण्याचें काम त्वरित करून दिलें त्यांतील सर्व कार्यकारी मंडळीचे आम्ही अत्यंत आभारी आहोत.
धी इंडिया पब्लिशिंग् कंपनी लिमिटेड
५ कावसजी रोड, फोर्ट-मुंबई.
अंक पहिला
स्थळ : लंकेंतील विरुपाक्षाचें मंदीर.
[बिभीषण परिचारकांसह प्रार्थना करीत आहे. ]
पद. ( श्री नटनायक ० )
मंगलदायक विश्वपतीला सद्भावें स्तवितो ।
ईशचरणिंचा प्रसादरज तो कार्य सुलभ करितो ॥ धृ० ॥
विरुपाक्षा विषधरा नटविशी वसुंधरा सारी ॥
कमलापति तूं दैवत आम्हां संसारीं तारी ॥
बलवंतचि तूं कविवर तूंची कुजनताप वारी ॥
मनुज जन्म हा प्रसाद ज्याचा तोची पूर्ण करितो ॥ १ ॥
पद. ( वंदी त्या त्रिगुणाला० )
ध्यातों त्या जगपाला । प्रभुला, आदिजननिच्या त्या
रमणाला ॥ धृ० ॥ मत्स्यस्वरूपा धारण करुनी ॥
चतुर्वेद-संरक्षणिं धांउनि ॥ कच्छ वराहचि नृसिंह होउनि ॥
सत्या सद्धर्माला उचली करिं धरि अवताराला ॥ १ ॥
विभीषण०-- एकाग्र चित्तानं परमेश्वराचं भजन केल्यामुळे मनाची स्थिती पहा कशी झाली ती-
पद. (राधाधर मधु० )
चित्त शांतिला वरी । मनाचा ताप सहज हो दुरी ॥ धृ० ॥
प्रभुभजनें मन पुनितचि होतां । ईशस्तवनिं ये मुक्ती हातां ॥
षड्रीपुछलना हरी ॥१॥ धैर्य पिता त्या क्षमा जननिला ॥
शांति-गेहिनी सत्य-सुताला । परमेश्वर चिर करी ॥ २ ॥
१ परिचारक०-- बिभीषण महाराज, ईशभजनाचा महिमा फार थोर आहे. सत्य तारण्याकरितां आणि असत्याचा नायनाट करण्यासाठीं ईश्वराने मत्स्य, कच्छ, वराह. नारसिंह, वामन आणि परशुराम असे सहा अवतार आजपर्यंत धारण केले खरें. पण बिभीषण महाराज, सांप्रत भूतलावर सुरूं असलेलीं अनाचारी व पापी कृत्यें पाहून ईश्वराला त्या श्रेष्ठ सत्यतत्त्वाची करुणा अझून कां येत नाहीं कोण जाणें?
बिभीषण०-- परिचारका! अनंतकाळ अबाधित सुरू असलेला सृष्टीक्रम कधींहि चुकायचा नाहीं. तो मनुष्यांनीं मदांध होऊन जर उल्लंघन केला तर परमेश्वर ती शिस्त हाणून पाडल्याशिवाय मात्र राहणार नाहीं, हें खूप ध्यानांत ठेवा. कारण-
साकी.
सत्याधारें सृष्टि तरे त्या ईश रक्षणा करितो ॥
धर्मक्रान्ति होतांच पाप तें छेदाया अवतरतो ॥
वचनहि त्या प्रभुचें ॥ वारी संकट या भूचें ॥ १ ॥
[ ` जय जय राम रघुवीर समर्थ ` शब्द ऐकू येतो. ]
२ परिचारक०-- रघुवीराच्या नामाचा हा जयघोष कुठून बरं ऐकूं येत आहे?
बिभीषण०-- काय? राम रघुवीराचा जयघोष? या राक्षसी लंकेंत रामाचा ध्यास करणारे प्राणी मुळींच नाहींत. तेव्हां हा नुसता आपल्याला भास झाला. कारण असं पहा.
पद. (यमन कल्याण--चौताल)
सतत मनन मन रामीं करितां । समर्थ जय रघुवीर शब्द हा
कर्णिं पडे, कां विस्मय करितां ॥ धृ० ॥ दशदिग्भागी राम
दिसतसे । स्थिरचर व्यापी राम गमतसे ॥ मन हें रामीं रंगुनि
जातां राम राम ध्वनि उमटे आतां ॥ १ ॥
--चला आपण आपल्या कार्याला जाऊं.
परिचारक० -- जशी आज्ञा. असं चलावं विभीषण महाराज.
[ जातात ]
अंक पहिला
प्रवेश १ ला
लंका नगरींतील राजरस्ता
[ मारुती प्रवेश करितो ]
मारुती :--
झंपा.
धडधड झंजावात सुटतां कडड कडकड तरुहि उमलति ॥धृ० ॥
अंबरांतचि चपल चपला।चमकतां भयभीत होती ।
हिंस्त्र पशु वसतिस्थलातें। त्यजुनि गिरिगुहरांत लपती ॥ १ ॥
गगनिं दिसतां दिव्य दिनकर। दीवाभीतहि तसें तस्कर ।
कृष्णवदना झांकिती खल। दडुनि तिमिरीं तेचि बसति ॥ २ ॥
गर्जितां रघुवीर नामा काळ कल्पांतास धडकी ।
भरुनि हृदयीं पळत सुटती । तीं पिशाच्चें चपल गतिनें ॥ ३ ॥
अहाहा! माझ्या रामाचं नांव तरि किति गोड!
पद. (भारती जडा०)
माधुरी तया अतीहि । अमृतीं नसे ॥ कल्पवृक्षसे। सुराऽसुरां
न प्राप्त तेंचि इष्ट देतसे ॥धृ॥ प्रभुस्मरणि गुंग मति सहज
भंगवी अघ पंथें । करि परीससम-कृति त्वरीत स्पर्शुनि प्रभू पदें ॥ १ ॥
--रविकुलभूषण श्रीमद्रामचंद्राच्या पवित्र नामाचा जयघोष करून, या लंकानगरीकडे मी रामसेवकानेजों उड्डाण केले, तो माझ्या भू भूःकारानं हा भूगोल डळमळू लागला; गगनांत नक्षत्रे जागच्याजागीं वितळून मेघांची दांतखिळी बसताच प्रत्यक्ष कृतांत काळाचाहि महाभयानें थरथराट झाला; माझ्या चपल गतीच्या उड्डाणामुळं उत्पन्न झालेल्या वायूनं महासागराचें खवळलेलं पाणी आकाशास भिडविलं, त्यामुळे सप्तपाताळांत एकच हाहा:कार उडाला. शेष गर्भगळित होऊन कूर्म आपल्या कवचाखालीं दडून बसला. दिग्गज चळचळा कांपला. मंदार पर्वत देखिल डळमळला. शचिपती प्रत्यक्ष इंद्र, पण तोहि घाबरला. पार्वती भयभीत होऊन शंकराच्या गळ्यांत पडली आणि कंपायमान झालेल्या कमलेचं शांतवन करतांना विष्णूची त्रेधाच त्रेधा उडाली. अशा रितीनं मनोवेगावरहि ताण करून मी या लंका नगरीत प्राप्त झालो. परंतु—
पद. (जठरानल शम०)
परमार्थी जन ज्ञान मिळवितां । विघ्न तयाला विरोध करितें ॥ धृ० ॥
सुजनकृतीला रिपु निपजावा ॥अमृतनिधि जहरें व्यापावा ॥
साधूं जातां निधान अथवा ।विवशि निश्चयें घाता करिते ॥ १ ॥
- या नियमानुसार रंभा राक्षसी आपले अक्राळविक्राळ तोंड पसरून माझ्या मार्गात येतांच माझी उडी त्यांतच पडली. पण रामनामानं अमर झालेल्या, सनातन धर्माभिमानानं स्फुरण पावलेल्या आणि आमच्या राजलक्ष्मीच्या शोधार्थ आपलें सर्वस्व अर्पण करणाऱ्या या वज्रदेही मारुतीनं रामस्मरणाच्या बलावर त्या विवशीच्या कानांतून पार निसटून जाऊन आपली मुक्तता केली, उड्डाणास पुन्हा सुरवात होतांच मैनाक पर्वत, सिंहिका, यांचा यथास्थित समाचार घेऊन लंकादेवीस मुष्टीप्रहाराचा प्रसाद तर दिलाच. पुढें भेटलेल्या क्रौंचा नामक रावणाच्या भगिनीचा व इतर राक्षसिणींचा फन्ना उडवून नुकताच या ठिकाणीं आलो. अरे पण!हें रत्नखचित सुंदर मंदीर कोणाच बरं? अहाहा---
पद. (किती कपटि०)
शचिपतिसम वैभव ज्याचें ॥ रमणिय स्थलिं या भोगित सौख्या
धन्य देव पुरुषाचें|| उंच ध्वजा या डुलति प्रदर्शनिं वैभव
दाविति ज्याचें ||१|| स्फटिक-शिळांवर सुवर्ण-चित्रें सार्थक हो
नयनांचे ||२|| भाग्यशालि हा कोण भोगितो भोगहि सुरलोकीचे ||३||
पण नाही. छे! या लुटारू लंकेतल्या कोणत्याही प्राण्यास ‘भाग्यशाली` ही उपमा बिलकूल शोभत नाही. ज्या या लंकाद्वीपस्थ राक्षसांचा बाणा केवळ अधर्माच्या व अनीतीच्या तत्त्वांवर वैभव मिळवून त्यावर चैन करण्याचाच आहे. त्यानां ‘भाग्यशाली, ईश्वरावतार, परोपकारी, प्रामाणिक, इत्यादि विशेषणें लावणारा निदान हा रामभक्त मारुती तरी खास नाहीं. हें ऐश्वर्य चोरटें असो, नाहींतर निढळाच्या घामाचें असो, या महलांत नीट बारकाईनें तपास केला पाहिजे. त्याशिवाय सीतामातेचा शोध लागणार कसा?
[ इंद्रजीत सुलोचना यांचा महाल. ]
-हें तर मूर्तिमंत पापाचरण मी पहात आहे. आर्यावर्तवासी श्रीरामाची सीता ती हीचकाय? असं असेल तर या मुष्टीचा प्रहार-पण नको. हीं दोघे काय भाषण करतात तें प्रथम ऐकलं पाहिजे.
इंद्रजीत०-- (सुलोचनेस) खरोखर तुला निर्माण करते वेळीं चंद्र प्रसन्न झाला असावा, किंवा वसंत झाला असावा. अथवा एका श्रृंगारातच जो नेहमी रमतो असा साक्षात् मदनच कारागीर होऊन त्यानं तुला घडवली असावीं खास.
मारुती०--- (स्व.) ज्या नीच मुखानं आमच्या सीता मातेबद्दल असले नीच शब्द उच्चारले त्याची जिव्हा हांसडून तिचे शतश: तुकडेच केले पाहिजेत.
इंद्रजीत०-- प्रिये, शेषकन्ये! मी काय म्हणतो इकडं तुझं लक्ष आहे ना? कारण असं पहा-
पद. (या तव बघुनि०)
जो नित वेदपठणि रमला ।मतिला जाड्यचि ये त्या जरठाच्या ॥
जुनाट ऋषि विधि नच शकला ॥ धृ० ॥ सस्मित वदना सिंहकटीला
सडपातळ तनुवल्लीला रतिहुनि ।सुंदर युवतीला या स्वप्निं न
रंगवितां शकला ॥ १ ॥
सुलोचना०-- एखाद्याचं वर्णन करायला इतकी कांहीं कविकल्पना लढवायला नको. मला उत्पन्न करणारा वसंत असो नाहीतर मदन असो, मला दासीला हे पुण्यचरण सेवा करण्याला प्राप्त झाले आहेत. यांतच मी आपल्या नशिबाला फार भाग्यवान समजतें.
मारुती०-- (स्व०) त्या राम-मणिकापेक्षांक्षा हा गारगोटीचा दगड तुला आवडला काय? आणि त्यांत तुझें पूर्ण भाग्य समजतेस? ठीक आहे.
इंद्रजीत०-- इंद्रादि तेहतीस कोटी देवांवर हुकमत चालविणारा चौदा चौकड्यांचा अधिपती जो त्रैलोक्याधीश रावण त्याचा मी राजपुत्र-- तेव्हां तुझ्या बलवत्तर दैवाची तूं जी प्रशंसा केलीस ती योग्य आहे.
सुलोचना०--आतां स्वारी आनंदांत आहे म्हणून एक गोष्ट विचारतें-- विचारूं काती गोष्ट?
इंद्रजीत०-- खुशाल विचार.
सुलोचना०-- आपलं म्हणतात ना, बोलण्यावरून बोलणं सुचतं. आपले वडील लंकानाथ फार अनुचित मार्गानं वर्तन करतात.
इंद्रजीत०-- काय? अनुचित?
होय. अगदी अनुचित.हेंकाय बाई बरं नाहीं. कोणत्याहि प्रकारचा संबंध नसता किंवा शत्रुत्वालाहि काही कारण नसतां ती जनक राजाची मुलगी चोरून आणून व्यर्थ व्यर्थ कुलक्षयास कारण घडवलं.
इंद्रजीत० --- यांत कुलक्षय होण्याचं कारण काय? पराक्रमी वीरांची पराक्रमी लीला चालली असतां किंवा ते पराक्रमी वीर स्वतःच्या मनाचा कांटा संतोषाच्या आणि चैनीच्या बिंदूवर समतोल ठेवीत असतां त्यांच्या हातून प्रत्यक्ष ब्रह्महत्या जरि घडली तरित्या पापाची जबाबदारी आम्हांवर मुळींच नाही.
सुलोचना०--- हो. असं म्हणून चालेल तरि कसं? महाराज-
पद. (तरुणीस ही०)
अनुचीत ही कृति करीतां जनीं ॥ धृ० ॥
अन्य स्त्रीस वांछिती । गुरुद्रोह दाविती ॥
विप्र छळित नित । नरकीं जाती । प्राणी ॥ १ ॥
शील भ्रष्ट होतसे । कुमति योग्य ही नसे ॥
मूर्तिमंत खल । अल्पायुषि ते । प्राणी ॥ २ ॥
इंद्रजीत०-- अल्पायुषि झाला म्हणून त्यांत काय वाईट? त्याला जितकं आयुष्य लाभेल तितक्यांतच त्यानं आपली वैभवी सत्ता गाजवून घ्यावं.
सुलोचना०-- महाराज-
पद. (दाखवि तव दिव्य.)
अवलोकन शील करा पात्र न ही कुमती ॥
काढित पाखांड मतां त्या न मिळे सुगती । धृ० ॥
हरिहर-स्तुति-उच्छेदा। गर्वबळें करि निंदा।
परमेश्वर त्यास सदा । नरकी ने अंतीं ॥ १ ॥
- महाराज, सत्याच्या रक्षणार्थ, न्यायी प्रजापालनार्थ आणि धर्माच्या उन्नतीसाठी त्रैलोक्यपति राजांची सिंहासन स्थापलेली असतात.
इंद्रजीत०--- स्थापलेली असतील कदाचित. परंतु राजे लोकांनी आपलं वर्तन कसं ठेवावं याचा निर्णय करण्याची शक्ती व इच्छा हीं नेहमीं आम्हां सत्ताधाऱ्यांवरच अवलंबून असतात.
सुलोचना०--- अनीतिचं व पापाचं बीज एकदां का एखाद्या भूमीत रुजलं की त्याचे वेल इतक्या त्वरेनं तेथील रहिवाशांच्या मानसिक मर्यादेंत जाऊन भिडतात कीं त्या भूमींत वास करणारे सर्व प्राणी अनीतीचे व पापाचे मूर्तिमंत पुतळे बनतात.
इंद्रजीत०--- सुलोचने! पवित्र पतिप्रेमानं आणि अर्धागी पत्नीच्या सुखवर्धनार्थ निष्कपट अंतःकरणानं आम्ही पुरुषांनीं बायकांना हृदयाशीं कवटाळून धरून त्यानां आनंदानं या हातावरून त्या हातावर गुलाबाच्या फुलाप्रमाणं झेललं की स्त्रियाना आपल्या योग्यतेच्या पात्रापात्रतेबद्दल तिळभरही भान न राहतां, केवळ विश्रांतीचं स्थान. सौख्याचं प्रतिबिंब पहाण्याचा आरसा आणि सर्व श्रमांचं परिमार्जन करणारा कल्पवृक्ष जो हा रंगमहाल, त्या ठिकाणीं शुष्क राजनीतीचा उपदेश करण्याचं धाडस करून प्रतिप्रेमाच्या निर्झर प्रवाहास कायमचा अडथळा आणतात.
सुलोचना०--- इकडच्या प्रेमाला मी जर योग्य नव्हतें आणि सत्यभाषण करण्याइतकी माझी पात्रता जर इकडे मान्य नव्हती तर अर्धांगीचा मान देण्यांत प्राणनाथांची चूकच झाली म्हणायची. ती चूक सुधारली जाईपर्यंत मी अश्शी या पायांपासून दूर रहाणार. ]
[ रागानें निघून जाते. तोहि जातो. ]
मारुती०--- एकूण ही रामपत्नी सीता नव्हे! या जोडप्याचा हा प्रणयी संवाद ऐकण्याचा या ब्रह्मचारी वायूनंदनाचा हा पहिलाच प्रसंग. परंतु विशेष समाधानाची गोष्ट ही कीं रावणानं आर्यावर्तात भिक्षांदेहीच्या ढोंगानं केलेलं चौर्यकर्म येथल्या रहिवाशांना विशेष डांचू लागलंय खास. असो. सीता-शुद्धीचं विस्मरण होतां कामां नये. बरं पण. हा मधुर ध्वनी न् तोहि श्रीरामनामाचा कुठून बरं येत आहे?
["राम राम राम सीताराम राम राम" भजन ऐकू येते.]
--- अहाहा!
`नाही रजतमाची वार्ता । न दिसे द्वेष हिंसा तत्त्वता ॥
पुराण श्रवण हरिकथा । याविण चर्चा नसेचि` ॥
किती प्रेमळ हें भजन! किती गोड है रामनाम । [ भजन गातो. ] ज्या भूमीच्या तुकड्यावर रामनामाचा जयघोष करून भक्त नाचतो, तेथील त्याचें चरणरज कपाळीं लावायें [ तसे करतो.] चरणरजाचा प्रताप तर किती अद्भुत!
पद (प्रणयतरंगास०)
राम कल्पतरु गमे । स्मरणिं भक्तमन रमे ।।
नच भ्रमे कधिं श्रमे नाम-सुरस-प्राशनें ॥ धृ० ॥
राम-परिस स्पर्शतां ।
चरण-सुरस प्राशितां ॥
अमर शांति लाभतां ।
स्पर्श करि न अघ भ्रमें ॥ १ ॥
काय चमत्कार पहा! हा पडला राक्षसाचा वंशज, पण भक्तराज व किती तरी सात्विक! माझा धनी रघुनंदन जेव्हां या लंकेंत येऊन ह्या अनाचारी रावणाचे सहपरिवार कंदन करील. त्या वेळी
साकी.
कामक्रोध मदमत्सर यानां संत पिटाळुनि देती ॥
साधाया निजबोध ज्यापरी त्यापरि विभिषण-हातीं ॥
लंका-राज्याला देइन विनवुनि मत्प्रभुला ॥ १ ॥
-असो. सीता-शुद्धी, सीता-शुद्धी. बसू, दुसरी गोष्ट नको. ऊं: ऊं:! अरेच्चा कसली ही घाण आली? आणि मेघींच्या गडगडाटाप्रमाणं घुर्रघुर्र घोरत हा कोण पडला आहे? अरे बापरे! हे तर जाडीच प्रकरण! यांच्या श्वासाबरोबर हत्ती, घोडे, म्हशी न् गाढवं पार आंत जात आहेत व उच्छवासाबरोबर ते सर्व धडाधड बाहेर येऊन कोंसळत आहेत.
[``स्वस्ति श्री कुंभकर्ण महाराज`` शब्द होतो.]
-- वाहवारे कुंभकर्ण! जाऊ या. आपलं काम बरं कीं आपण बरे. या लंका नगरीतील घरोघरची चर्या पाहिली तर वरवर मात्र आचारविचाराचा टाकम् टिकला दिसतो. परंतु अंत:स्थिती फारच अधर्माची. घरोघरीं पूर्ण अग्निहोत्रें आहेत पण या राक्षसांच्या दृष्टीस गोब्राह्मण पडले कीं दुष्टानी रगडलेच आपल्या दाढेखालीं. तसंच-
पद. (मज गमे ऐसा० )
युवति त्या युव से घातकी । दुराचारी ॥ धृ० ॥
थोर दिसति ते कुटिल वर्तनी ॥
वधुनि गोधन भक्षिति विपिनीं ॥
वानप्रस्थ ते स्वेच्छाचरणी ॥
इंद्रियदमना होत पारखी ॥ १ ॥
-अशा पापी प्रदेशांत ती जनककन्या मी अजाणत्यानं कशी बरं शोधून काढावी? सीतेनं योगगतीनं प्राण तर दिला नसेल? ती समुद्रांत तर बुडाली नसेल? कदाचित् अंतरिक्षातून खालीं पडून तिचा देह भस्मीभूत तर झाला नसेल? छे: रावणाने पकडून आणते वेळीं तिच्या शरिराला वेदना लागून तिनं प्राण सोडला खास. नाही तर रावणाच्या इतर स्त्रियांनी सवतिमत्सरानं पाश घालून ठार मारली असेल! हर हर! माते जानकी, काय तुझी ही दुःस्थिती । हें माझें उड्डाण फुकटच होणार काय? राम राम राम! पण मी शोक कां करावा? विघ्नाची काय बिशाद आहे की रामकार्यांत ते आडवें येईल. लाथ मारून शतचर्ण करीन.
पद. (मरण गणुनि०)
स्मरण करूनि रघुपतिचें विघ्न तुडवितों पदीं ॥
अग्नि प्रखर पेटतसे । प्रबळ निधी शमवितसे ।
त्यापरि मम रामनाम तारिल मज संकटी ॥ धृ० ॥
रुप सूक्ष्म गुप्त धरुनि । लंका उध्वस्थ करुनी ।
रावणवध-संधि सुलभ करिन स्फूर्ति ही हदीं ॥ १ ॥
[जातो.]
प्रवेश २ रा
लंकेचा राजरस्ता
विप्रभक्षक राक्षस घाबऱ्या घाबऱ्या धांवत येतो.
विप्र०-- पळा पळा पळा. बस्. दुसरी गोष्ट नाहीं, आपले जीव वांचवा पळा... काय म्हणता? अँ:! पळतांना मस्तकांत शिळा येऊन पडताहेत? मोठाच चमत्कार! काय झालं असेल ते होवो, कालपासून या लंकेत प्रळयांचा अगदी सुळसुळाट उडाला आहे. देवळांची मोठमोठी शिखरं, राजवाड्याचे मजले, ध्वजा आणि पताकांचे स्तंम धडाधड कोंसळून खाली पडत आहेत. राक्षसिणींची पोरं धरून आकाशांत गरगरा फेंकलीं जात आहेत; आणि ती खालीं पडून त्याचा चक्काचूर होतानां राक्षसिणींचा आकांत काय विचारायचा? स्त्रीपुरुषांनी एकत्र शयन केलेले पलंग राजरोस कोणी रस्त्यावर आणून ठेवीत आहे. भांडारगृहें फुटलीं जाऊन त्यातील चीज वस्तूंची एकसारखी नासधूस होत आहे. होत आहे. पण ती कोण करीत आहे. कांहीं कळत नाही. तो-तो माझा मित्र सर्वभक्षी राक्षस इकडंच येत आहे. पाहूं त्याला कांहीं कळलं असल्यास. कां? मित्रा सर्वभक्षे, क्षेम आहे ना?
सर्वभक्षी०-- [रडत प्र. क.] असेल बाबा असलें तर इकडे पाठीवर फटकारे खाऊन जीव जाईल तर बरं असं झालंय नि तुमचं आपलं चाललंय "क्षेम आहे ना?"
विप्रभक्षक०--- चुकलों बाबा. ही घ्या थोबाडीत मारून घेतली. पण हा प्रळय करतो तरि कोण? कांहीं कळलं कां?
सर्वभक्षी०-- अहो विप्रभक्षक, मी नुसताच राजद्वाराजवळ पहाऱ्याला होतो. तेथें राजवाड्यावरून एक भलं मोठं माकड आलं नि टिवल्याबावल्या करीत द्वारावर उंच ठिकाणीं बसलं. इतक्यांत बऱ्याच स्त्रियांचा घोळका डोक्यांवर पाण्याच्या घागरी भरून घेऊन येत होता. त्या माकडानं आपल्या शेंपटीच्या फटकाऱ्यांनीं त्यांचे सर्व कुंभ फोडले आणि त्या स्त्रियांच्या नाकाकानांतूनही तो आपलें शेंपूट वळवळऊ लागला. त्यासरसें त्या सर्व स्त्रिया फटाफट् शिंकावर शिंका देत आपला जीव घेऊन पळाल्या. याचा काही बंदोबस्त करावा म्हणून आमची स्वारी जरा पुढे सरसावली तो फटकाऱ्यांचा आमच्या पाठीवर एकसारखा वर्षांव होऊन त्याचं हे पहा-पहा तर खरं कसं अगदी धिरडं झालं तें?
विप्रभक्षक० -- खरंच हो खरंच. अगदी धिरडंच धिरडं झालं कीं हो! काय करावं बुबा या प्रळयाला. सर्वभक्षे! या प्रळयांनीं तुमच्या आमच्या सारख्या हलक्यासलक्या राक्षसांवरच कां बुवा हत्यार धरलं आहे? कांहीं कळत नाही.
सर्वभक्षी०-- आणि मोठ्या प्रस्थांना काय प्रसाद मिळाल्याशिवाय राहिला आहे. वाटतं? नुकतेच आपले प्रहस्थ प्रधानजी पालखींत बसून राजदरबारांत चालले होते. इतक्यांत त्या टवाळखोर व बंडखोर माकडान शेपटीचं टोक भोयांच्या कानांत खुपसले. भोई जे म्हणतां दचकले, त्यानी पालखी दिली धाडकन जमिनीवर टाकून. प्रधानजी जे म्हणतां आपटले ते काय विचारूंच नका. रागारागाने उठले नि लागले त्या भोयांना धोपटायला. भोई पण कसले बेटे खमंग. ते लागलेच म्हणाले ` रावण महाराजांनी जानकी आणली पळवून, तिनं हें भूत उत्पन्न केलं, त्या भूतांनीं केली थट्टा मग उगीच आम्हाला कां देता रट्टा?
विप्रभक्षक०-- पण कायहो. आतां याला उपाय काय? हीं तर सर्व अपशकुनांची माळका लागली आहे. नगरद्वारीं लक्षानुलक्ष घागरी फुटणं; गोपुरं, कळस, राजवाडे कांहीं कारण नसतां कोसळणं; मंदिर जागच्याजागी जमीनदोस्त होणं, ही चिन्हं कांहीं बऱ्यांतलीं नव्हेत.
सर्वभक्षी०-- आणि नापित रावणाची श्मश्रू करीत असतां त्याची एक मिशी त्याच्या हातून उतरली जाणं हा काय शुभ शकून वाटतं?
विप्रभक्षक०-- छे: हो अपशकुनच हा पण याला आतां उपाय?
सर्वभक्षी०-- आतां याला एकच उपाय, आन् तोहि--अयोध्यावासी रामाची बायको ती जानकी त्याला ताबडतोब परत नेऊन द्यावी हाच.
विप्रभक्षक०--- पण असल्या प्रकारचा उपदेश करणाऱ्या दूताची काय त्रेधा रावणानीं केली? त्याचे नाक कान कापून गाढवावर धिंड काढली. असो काय होईल तें होवो. चला. आज अस्मादिकाच्या घरीं मेजवानी आहे. अनमान न करतां तुम्ही पण हं :! या झालं. मी तर केवळ विप्रमांस भक्षण करणारा-पण तुम्ही तर सर्वभक्षी आहांत.
सर्वभक्षी०-- मात्र लवकर सुटका करा. कारण रावण महाराजांची स्वारी आज मंदोदरी बाईसाहेबांच्या महालांत येणार असून तिथें आज आमचा पहारा आहे. चला. अयाई! पाठीला कळा लागल्या हो.
विप्रभक्षक०-- विप्रमांस भक्षण करा कीं ताबडतोब गूण येईल. अरे बापरे, आपले प्रहस्थ प्रधानजी, तो क्रूरवदन आणि तो अधोमुख इकडंच येत आहेत. चला आपण दुसऱ्या वाटेनं जाऊं.
[जातात.]
[प्रहस्थ प्रधान, क्रूरवदन, अधोमूख प्र. के.]
प्रधान०-- ते व्हायच नाही, याचा शोध लागलाच पाहिजे, अशा महत्त्वाच्या गोष्टींत जर आम्ही लक्ष पुरविलं नाहीं, तर राज्यकारभाराचा गाडा सुरळीत चालायचा नाही. तुम्ही त्या माकडाचा नीट तपास केलाच पाहिजे.
क्रूरवदन०-- महाराज, याची सर्व माहिती या अधोमुखाला असलीच पाहिजे. कारण हा आर्यावर्ताला राहणारा आणि तो माकडहि म्हणे त्याच प्रदेशांतला.
प्रधान०-- कायरे अधोमुखा, अशी खालीं मान घालून काय उभा राहिलास?
अधोमुख०-- (स्व.) मी अधोमुख आहे म्हणून
प्रधान०-- तुलाच त्या बंडखोराचा नीट तपास लावला पाहिजे. तुमच्यावर सोंपविलेली दूतवृत्ती अशीच बजावीत असतां वाटतं? दुसऱ्या एका विश्वसनीय दूतानं आम्हाला अशी बातमी दिली आहे कीं काल एका अग्निहोत्री ब्राह्मणाकडे अग्नीपूजन प्रसंगीं तो हजर होता; इतकंच नव्हे तर आमच्या सम्राटाच्या वृद्धिंगत साम्राज्यशक्तीच्या विरूद्ध कांहीं शब्द उच्चारल्याचें आम्हाला माहीत झालं आहे. तर तू-अधोमुखा! या क्रूरवदनाच्या सहाय्यानं त्या माकडाचा तपास करून त्याला आमच्यासमोर हजर करा.
अधोमुख०-- तो माकड उत्सवाला जरि आला असेल—
प्रधान०-- असेल म्हणजे? तो आलाच होता.
अधोमुख०-- बरं आला होता. परंतु त्याला उत्सवाचें आमंत्रण नव्हतं. सर्व लंका नगरींत प्रळय करतांना तो सर्वत्र संचार करीत होताच. त्यांत तो घटकाभर तिथं कोणाला दृष्टीस पडला असेल.
क्रूरवदन०-- कां? त्याची फारशी तरफदारी चालविली आहे? प्रदेशाच्या वळणावर जातां वाटतं? महाराज, हें साफ खोटं आहे. त्या टवाळखोर माकडाचा पत्ता या अधोमुखाला लागला नाहीं, तर त्या अग्निहोत्री ब्राह्मणाला सुळीं चढवावा, नाहींतर हिंसक क्रूर पशूकडून त्याचें शरीर फाडवावें. हा अधोमुख आपल्या प्रांताच्या लोकांची तरफदारी करतो.
प्रधान०-- खरं कां रे अधोमुखा? याद राखून ठेव. दूताची पत्करलेली वृत्ती जर नीट बजावली नाहींस तर त्या अग्निहोत्री ब्राह्मणाच्या ऐवजीं आम्ही तुलाच फांशी देऊं.
[जातो.]
अधोमुख० --- (स्व.) धि:कार असो या अधोमुखाच्या जीविताला! पोट जळत नव्हतं म्हणून ही दूतगिरी पत्करली. या आत्मघातकी सुरीनं कोणकोणाचे गळे कापण्याचा प्रसंग मजवर येतो कोण जाणे? वेदांचा, विप्रांचा आणि गायित्रीचा अमानुष छळ पहातांच इतक्या दिवस या दूतवृत्तीवर टिकण्याइतका कृतघ्न व निष्ठूर अंत:करणाचा मी बनलों कसा, याचंच मला फार आश्चर्य वाटतं. (उघड) क्रूरवदना, प्रधानजीजवळ माझी नालस्ती करून तुलारे काय मिळालं?
क्रूरवदन० --- काय मिळाल? वा:! किती तरि मिळालं? माझ्या वृत्तीच्या वरच्या दर्जाच्या वृत्तिमर्यादेत एक पाऊल पुढं पडलं. हें काय कमी झालं वाटतं? अरे बाबा, वरचे दर्जे मिळविण्यासाठीं वरिष्ठ सत्ताधाऱ्यांची हांजी हांजी करणं किंवा तुझ्या सारख्यांची निंदा करून त्यांची मनं कलुषित करणं यापेक्षा तिसरा मार्गच नाहीं.
अधोमुख०-- तुला माझा दर्जा पटकावण्याची इच्छा आहे कां?
क्रूरवदन० -- तो दर्जा मी तुझ्यापासून दान नाहीं घेणार. तो मी आपल्या मनगटाच्या जोरावर घेणार.
अधोमुख०-- मलाहि या दूतगिरीचा आतां कंटाळा आला बुवा.
क्रूरवदन०-- कांरे बुवा? आर्यावर्ताच्या अरण्यांत कंदमुळं खात, रानटी व अज्ञानी स्थितींत पडून होतास, त्या तुला या लंकाद्वीपांत उच्च स्थिती प्राप्त झाली—
अधोमुख०-- पण ती स्थिती फार उंच वाढून तिच्यावरून खाली कडेलोट करून घेण्यापक्षा, आहे एवढ्याच उच्चतेवरून खुशीनं खाली उतरावं हे बरं. त्यांतून प्रधानजीचं मन तू आतांच कलुषित केलंस. तेव्हां दूतगिरीचं हें वैभव आता बस्स झालं. पोटांत कांटे भरण्याची वेळ आली तरि पत्करली पण दूतगिरीच्या कठोर व आत्मघातकी सुरीनं एकमेकाचे गळे कांपण्याचा प्रसंग नको.
[जातो]
क्रूरवदन०-- ह्यः ह्यः ह्यः । वृत्ति सुटली कीं हा उपाशी मरणार. उपास सुरू झाले की भीक मागणार. भीक मागायला अस्मादिकाच्या वाड्यावर येणार आणि आम्ही त्या वेळीं या हुरळ्याला आमच्या वृतीवर कमावलेल्या अगणित संपत्तीचा खजिना दाखवून वृत्तिवैभवाच्या दृष्टांतानें पुराच खजील करणार.
[जातो.]
प्रवेश ३ रा
मारुती प्रवेश करतो.
मारुती० :--
झंपा.
घोर प्रळयिं उध्वस्त लंका | धाडिले अमित खल
काळलोका || धृ० ॥
गुप्तरूपें कधीं प्रगट कधि होउनी । मर्दिलें राक्षसां मुष्टिघातें ॥
हाणितां लाथ हृदिं कुजनमुख छेदितां । हर्ष अति जाहला मज न
शंका ॥ १ ॥
--भावी युद्धप्रसंगी शिल्लक राहिलेल्या राक्षसांना असंच ठोकून जमीनदोस्त करण्याची परवानगी श्रीरामानीं मला एकट्यालाच जर दिली तर अत्यानंद ब्रह्मानंद म्हणतात त्यापेक्षां वरीष्ठ प्रतीचा आनंद या मारुतीला होईल. आपल्या शत्रूचा कंठ चरचरा चिरून त्याच्या रुधिराचं आकंठ प्राशन करण्यात जीवित साफल्याची खरी मौज आहे. लंकाद्वीपस्थ राक्षसांनो, तुमच्याहि कंठाची तीच स्थिती असल्याचे भावी काळ मला स्पष्ट सांगत आहे. असो. जनकी मातेचा कुठं शोध लागेल या आशेन मी घरोघरचं गुप्त भाषणहि ऐकतो. पण निश्चित स्थळासंबंधी कोणीच काही बोलत नाही. कामशांतीसाठी राखून ठेवलेल्या रावणाच्या ऐंशी हजार स्त्रियांची शयनमंदिरे मी तपाशीत तर आलोच. परंतु हा महाल मात्र पहाण्याचा राहिला आहे. ही कोण बरं स्त्री असावी? या स्त्रियेच्या कांतीवरूनरून जनकन्या ती हीच असावी, असा माझा तर्क आहे. संशयच नको—
साकी
शय्येवरती निद्रीत सीता परमपुरुष-चिच्छक्ती ॥
राजलक्ष्मी हीच जानकी शोधिलि म्यां मद्भक्ती ॥
सफलहि रामपदी ॥ जनना मोक्षचि भी साधीं ॥
--या पहा, काही स्त्रिया सीतेची करमणूक करण्याकरिता नृत्य गायन करीत आहेत. या ठिकाणी विशेषतः रावणाच्या बंदीत सीतेला इतक्या ऐश्वर्यात कस ठेवलं आहे कोण जाणे? या गौप्याचा नीट तपास केला पाहिजे.
(देखावा :-- मंडोदरीचा महाल, मंडोदरी बसली आहे. दासींचा नाच सुरू आहे.)
नृत्याचे पद
नाचूं गाऊं चला या ॥ विहारि शशी अंबरांत
नाचे प्रणयानें मन मोही ॥धृ॥
घेउनिया संगतीस तारागणाला || फेंकितसे
रंगा विहारी ॥ हे धवल किरण पाडी त्रिलोकि
छान ॥ स्वकरिं रतिपतिसम धनु-किरणा
प्रणयिजनां देत मना मोदास भारी ||१||
मंडोदरी-- क्रुद्धभाषणी पुरे करा तुमचं हे नृत्य गायन
क्रुद्ध-- आज सकाळपासनं राणी सरकारच्या जिवाला चैन नाहीस दिसतं.
मंडोदरी-- सकाळपासन काय झालं असेल ते होवो, जिवाला एकसारखी हुरहुर लागून राहिली आहे.
मत्सरनयनी-- मला वाटतं राणीसाहेब या पुढच्या स्फटिकगच्चीवर येतील तर ही चांदण्याची शोभा पाहून त्यांच्या मनाला जरा बरं वाटेल.
मंडोदरी-- बरं तसंच का होईना?
कुद्ध-- बाईसाहेब, किती तरी शुभ्र चांदणं पडलयं हे?
मत्सरनयनी-- राणीसाहेब, हे पाहिलंत का आणखीं?
पद. (दिल्दार यार)
गगनांत निशाकांत दिसे रम्याकृती ॥धृ॥
इंदु सुमन वाटे । तारातति दाटे।
मधुर मधूसेवनिं हो लोलुप मधुपाकृति ||१||
नवरदेव किंवा । मिरवीतचि न्यावा ।
तारकागणी रजनिनाथ शोभतो किति ॥२॥
नटलि रजनि-कांता । ग्रह-पुष्पहार हातां ।
घेऊनि ये मंद मंद लज्जायुत संप्रति ||३||
मंडोदरी-- छे: बाई, यांत काही मला गोडी वाटत नाही. मी जरा निजतेच. माझ्या अंगावर हा शेला घाल न स्वारीचं येणं झालं की मला जागी कर. (निजते)
क्रुद्ध-- (मत्सरनयनीस उद्देशून) भलत्याच ठिकाणी आपली छाप बसवायला गेलं की अशीच खोड मोडली पाहिजे. ` राणी साहेब, राणी साहेब ` करून वशिले लागले मग काय? पण जित्याची खोड मेल्याशिवाय जाते कशी?
मत्सर-- क्रुद्धभाषणी, तुझ्या टोमण्याचा भावार्थ न कळण्याइतकी मी काही दुधरखुळी नाही बरं. रावण महाराजांची आवडती दासी असलीस म्हणून आमच्यावर काही इतकी सत्ता मिरवायला नको समजलीस?
क्रुद्ध-- मत्सरनगनी नावाप्रमाणंच तुझी कृती असायची. मी नेहमी रावण
महाराजांच्या खास महालांत सेवेला असते म्हणून माझ्यावर मत्सराचा इतका काही पाऊस पाडायला नको समजलीस?
मत्सर-- बोलूनचालून तूं पडलीस क्रुद्धभाषणी तेव्हा तुझ्याकडून गोड भाषणांची अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणाच आहे. कारण-
पद. (तू श्रीमंविण)
पाहिल वंध्या स्त्री सुतवदना ।
दिसेल शुष्कचि सागर अथवा पर्वतचलना ॥
भूवरिं येइल रवि दिननृपती ॥
अग्नी त्यागिल दाहकता जल स्वभावस्थिति ती ॥
चुकेल दिनकर नियमित उदया।
परि भाषण तव क्रुद्ध सदोदित चुके न समया ||१||
क्रुद्ध-- कविकल्पनांचं नुसतं पेव फुटलंय.
मत्सर-- पण कवींची योग्यताहि तशीच असते.
क्रुद्ध-- काय पण मेली योग्यता? चोर आणि कवी अगदी एका माळेचे मणी
मत्सर-- ते कसं? हा नवीन शोध दिसतो.
क्रुद्ध-- नवीन नाही बरं! जुनाच आहे. ऐक
पद. (मजा देता है)
कुणि उच्च नीचही नाहीं । कवि तस्कर सम हे पाही ॥धृ॥
एकांत पसंतचि त्यांना ॥
सावधशी मृदु पदरचना ।।
कौशल्य अलंकारांनां ॥
वांछिती करि कृति समहि ||१||
("राजाधिराज रावण महाराज`` शब्द ऐकू येतो.)
क्रुद्ध--बस झालं आपलं पांडित्य
मत्सर--तुझं का माझं?
मारुती--(स्व) सीता रावणाला वश झाली की काय? हा नीच रावणहि इकडंच येत आहे.
रावण--(प्र.क.) राज्यकारभाराचं काम कितितरी बिकट आहे!
पद. (केदार- दीपचंदी) किंवा मालकंस
शिरीं किरिट ज्याच्या तया सांख्य नाही ॥
वधाया अरी मन सदा दंग राही ॥धृ॥
प्रजाद्वैत कोठें बसे त्या हराया ॥
रक्षावया विभव मति सज्ज राही ||१||
प्रभूच्या कृपें पात्र सिंहासना मी ॥
चिरास्तित्व कैसे तया? काळजी ही ||२||
--असो. आता प्रियेच्या महालांकडं जावं झालं. अहाहा! या नुसत्या महालाचे दर्शनच मला किती आनंद देत आहे. (महालात जाऊन) काय? ही आज अशी म्लान का दिसते?
क्रुद्ध-- बाईसाहेबांची प्रकृति आज सकाळपासनं अगदी उदास झाली आहे.
रावण-- याचं कारण काय बरं?
मंडोदरी-- (झोपेत) अयाई! घात झाला!
रावण-- (जवळ जाऊन) अरे! ही आज अशी का करते? मंडोदरी?
मारुती-- एकीकडे) एकूण ही रामपत्नी सीता नव्हे.
मंडोदरी-- ( ओरडत जागी होते) धावा हो धावा. अयाई घात झाला!
रावण-- ( तिला सावरीत) प्रिये मंडोदरी, काय झाले? अशी घाबरलीस का निद्रेतून एकदम जागृत होऊन अशी शोक का करू लागलीस? क्षणभर माझ्याकडे पहा. पंचमहाभूतादि सर्व तत्त्वें ज्याच्या सेवेला हजर आहेत असा लंकापति रावण-तुझा पती प्रियकरणी तुझ्याजवळ असता थरथर कापतेस का? बोलत का नाहीस? तुला कोणी स्वप्नात त्रास का दिला? सांग पाहू? असं गुप्त कारण तरी काय घडलं? मंडोदरी, प्राणविसावे! बोल बोल काय झालं ते?
मंडोदरी-- महाराज, काय सांगू न सांगू तरी कसं? प्राणनाथ, माझी सौभाग्यदर्शक शळसरी-अगबाई पण ही तर माझ्या शळ्यात आहे-हो पण, ती जळून गेलेली मी स्वप्नात पाहिली. एक मोठा बलवान वानरयोद्धा या लंकेत येऊन त्याने आपल्या लाडक्या अखयाला ठार मारून इंद्रजिताचा समरांगणांत नाही नाही तो छळ केला. जनकराजाचा जामात शुभ मुहूर्तानं समुद्रावर शिलापंथ करून अद्भुतदळासह या लंकानगरीवर चाल करून आला.
रावण -- बरं मग? पुढं आणखी काय? सांग सांग तर खरी अशी स्फुंदू नकोस.
मंडोदरी -- प्राणनाथ, कसे हो ते अपशब्द मी उच्चारूं । प्रियकरा, मला चांडाळणीला-हायहाय! ते दुःस्वप्न मला बोलवले तरी कसं? आणि सांगू तरी कसं?
रावण-- प्रिये मंडोदरी! त्रैलोक्यातील दैदीप्यमान, प्रबळ आणि अजिक्य म्हणून आपल्या साम्राज्यशक्तीच्या मर्दुमकीबद्दल शेखी मिरविणाऱ्या देवदानवाच्या सर्व राष्ट्रांना एका क्षणात धुळीला मिळविण्याची ज्या या लंकापतीची शक्ती श्रेष्ठ आहे ; क्रोधायमान होऊन भूतलावर माझा त्रैलोक्यपतित्वाचा लत्ताप्रहार आपटतांच ज्या या प्रचंड भूगोलाचे खडपेच खडपे उडतील ;अपमानाची क्षुल्लक झुळूक लागतांच ज्या या लंकाधीशानं आपले खदिरांगारासारखे लालबुद डोळे वटारतांच या विश्वाची निमिषार्धात राखरांगोळी होईल त्या रावणाच्या पट्टराणीला कोण ताप देत आहे त्याचा नुसता नामनिर्देश कर. त्याला युद्धाचे आव्हान करून भर समरागणांत लाथ मारून जमीनदोस्त करितो. माझ्या मंडोदरीचा जो अपमान तोच माझा अपमान. तू काय स्वप्नात पाहिलंस ते सर्व सांग?
मंडोदरी--प्राणनाथ, कुंभकर्ण इंद्रजीतराह आपला-या माझ्या सौभाग्य तिलकाचा-वध करून तो विजयी झाला. लंकेचं संपूर्ण राजय बिभीषण भाऊजीना देऊन तो दाशरथी सीतेला घेऊन दरबारासह अयोध्येला परत गेला.
रावण-- हेच का ते स्वप्न? मला वाटलं की आणखी काही चमत्कारिक व भयंकर प्रकार तू स्वप्नात पाहिलास. अँ:! त्यातं ग काय अर्थ? ही स्वप्न म्हटली म्हणजे अगदी क्षुल्लक किंमतीची! त्यांतील गोष्टी खच्या मानून त्यासाठी आपलं मन व्यर्थ दुखविणं तुझ्यासारख्या त्रैलोक्यापत्तिपट्टराणीला बिलकुल शोभत नाही, असं पहा –
पद. (अधर वारुणी)
चपल मानसी चंचल प्रगती ।
भ्रम हा सारा शुष्कचि त्या गणुनी ।
सुजन ते त्यातें त्यागिती ॥धृ॥
चंचल मन हैं रिक्तचि असतां ।
विफल तरंगी ने मनसमता ।
व्यर्थ असे स्थिती ती ||१||
सार्वभौमदिं वित्तहीन तो
स्वप्नी आरुढ वैभविं होतो ।
सत्य न त्या वदती ॥२॥
मंडोदरी--प्राणेश्वरा, हे स्वप्न क्षुल्लक नाही बरं? हे केवळ ब्रम्हवचन समजा. महाराज, मी पदर पसरून मागणं मागते की त्या मंगलदायक रघुनंदनाला त्याची सीता परत नेऊन द्या आणि त्याला शरण जा हेच सध्या इष्ट दिसतं.
रावण -- काय शरण? छे: हा तुझा सल्ला मला बिलकूल पसंत नाही. या रावणावर प्रत्यक्ष कल्पांतरुद्र जरी कोपला, जगातील सर्व ज्वालामुखीचा स्फोट होऊन त्यांनी या माझ्या मस्तकावर प्रखर अग्नीचा जरि वर्षाव केला, किंवा हिमालयापेक्षा प्रचंड पर्वतांनी एकवटून या माझ्या मस्तकाचे चूर्ण केले तरी पण उदात्त राजकीय कल्पनांनी आणि वीरश्रीनं स्फुरण पावलेल हे माझं थोर मस्तक तशाहि स्थितीत कोणाच्याहि पुढं एक केसभरसुद्धा वाकणार नाही, हे पूर्ण ध्यानात ठेव. मग शरण जाण्याची गोष्ट तर दूरच राहिली.
मंडोदरी-- पण महाराज, परस्त्रीचा अभिलाष धरून कोणाचं बरं चांगलं झालं आहे? त्यातून हा पुराणपुरुषाचा अवतार आहे बरं? गळ्यात धोंडा बांधून कोणी कधी महासागर तरल्याचं पाहिलं आहे काय? मूर्तिमंत विषाचं प्राशन केल्यावर त्याचं कल्याण तरी कसं होणार म्हणून म्हणते, कसंहि करा पण या मंडोदरीची एवढी विनंती मान्य करून येत असलेलं भावी संकट दूर करा. नाही तर मीच रघुनंदनाला त्याची पत्नी अर्पण करून शरण जाईन नि मला चुडेदान मागून घेईन. पण श्रीरामचंद्रापुढं ही मात्रा नाही वर चालायची. हा कोणी मानव नसून भक्तजनाला व सत्याला तारण्यासाठी हे पूर्णब्रह्म अवतरलं आहे.
मारुती-- (एकीकडे) धन्य धन्य मंडोदरी, तूं ज्ञानाची कामधेनू आहेस.
रावण-- (स्व.) आता हिची समजूत कशीतरी करून वेळ मारून नेली पाहिजे. स्वयंवरसमयी भरसभेत एवढा अपमान सहन केला; अकटोविकट प्रयत्न करून, हजारो मसलती लढवून, अनेक वेषांतर करून लाखो प्रण्यां चे बळी घेऊन आणि सत्यासत्याचीही पर्वा न करिता ज्या सीतेला या रावणांनं दंडकारण्यातून येथे आणली आणि वशप्राप्तीसाठी पाच कोटी कडव्याराक्षसांच्या कडक बंदोबस्ताखाली अशोकवनात ठेवली त्याच सीता सुंदरीला या मंडोदरीच्या प्रलापानं वितळून जाऊन मेषपात्राप्रमाणे त्या मानवी दशरथपुत्राकडे परत पाठविण्यासाठी काय? छे: मुळीच नाही. एकदा तरी त्या सुदरीचा तारुण्स्वाद चाखून मी आपली महत्त्वाकांक्षा पुरी करून घेणार.
मंडोदरी-- प्राणनाथ एवढा विचार तो कसला? या दासीच्या शब्दांवरील आपला भाव अगदीच उडाला ना?
रावण०-- असं होईल तरि कसं लाडके? अर्धांगीच्या शब्दाला मुळींच मान न देण्याइतका हा रावण अविचारी नाहीं. कारण असं पहा-
पद० (स्फटिकाचे ते०)
देवकरी जें सुख लाभतसे ।
श्रेष्ठ तयांतिल कांता विलसे ॥
श्रांत मना करि शांतचि ललना ॥
मधुर वचें हरवी ह्रच्छलना ॥
प्रियकर दर्शन अर्धांगीचें ।
रमवित नित मन हें पुरुषांचें ॥ १ ॥
मंडोदरी०-- पण नुसत्या या शास्त्रार्थावरच माझी समजूत नाही बरं व्हायची?
रावण० -- समजूत व्हावी असं कोण म्हणतो? तुझ्या म्हणण्याप्रमाणें जानकीची उदईक मुक्तता करतों मग तर झालं ना?
मंडोदरी०-- होय गडे. त्यातच आपलं कल्याण आहे.
रावण०-- बरं तर. कोण आहे तिकडं?
दासी०-- (प्र. क.) काय आज्ञा सरकार?
रावण०-- अशीच अशोकवनांत जा. आणि तेथे बंदीत ठेवलेल्या सीतेचा काय समाचार आहे तो घेऊन ये. जा.
दासी०-- सरकारची आज्ञा शिरसावंद्य.
[जाते.]
मारुती०-- (स्व.) भला शोध लागला. आतां या दासीच्या मागोमागच जावं झालं.
जय जय रघुवीर समर्थ.
[जातो.]
रावण० -- लाडके मंडोदरी, त्या स्फटिक गच्चीवर क्षणभर विश्रांती घेऊ चल. ही पाहिलीस का मध्यान्ह रात्रीची शोभा?—
पद० (रजनीनाथ हा-)
गगनसागरी शशि हा रमला ॥ उडुगणयूथीं जलक्रीडेला || धृ० ॥
अंबर-उपवन फुललें । खासे तारागण-सुमनांच्या श्वासें ॥
मन्मथ-शशि हा विहार भासे । सज्ज करुनियां किरण-धनूला ॥ १ ॥
सौंदर्ये नटली रति-रजनी । उत्कंठित ती पतिमूखमिलनी ॥
धन्वाकर्षणिं लाजुनि स्वमनीं । दृढालिंगनीं सुखवित पतिला ॥ २ ॥
अंक पहिला समाप्त.
अंक दुसरा
प्रवेश १ ला
स्थळ :- अशोकवन लंका.
[सीता ध्यानस्थ बसली आहे. जवळ त्रिजटा आहे; अधोमुख, शतमूर्ख, क्रूरवदन पहारा करीत आहेत. मारुती येतो.]
मारुती० -- अहाहा! हीच ती माझी माता जानकी, आज माझ्या जन्माचं व रामभक्तीच खरंखरं सार्थक झालं. येथे काय चमत्कार आहे पहा- वृक्ष, पंचभूतें, पक्षी वगैरे एकसारखी रामस्मरण करीत आहेत. एवंच या लंकाद्वीपांतसुद्धा अयोध्यावासी रामाचा घ्यास करणारे प्राणी जन्मले आहेत. बाबानों! तुमचा हा ध्यास त्या मदांध रावणाला सध्या जरि मानवत नसेल तरि पण रामभक्तांनो धीर सोडूं नका. श्रीराम तुम्हांला अंती यशश्री दिल्यावाचून खास रहाणार नाही. हं:! हे तीन राक्षस माझ्या मुष्टीप्रहराला बळी पडण्यायोग्य आहेत खास. मुष्टीनो, जरा थांबा उतावीळ होऊ नका. वेळ भरतांच हे तिघेही तुमच्या तडाख्यात सापडल्याशिवाय राहणार नाहीत. अहाहा! पुराणपुरुष श्रीरामचंद्राची पत्नी सती सीता ती हीच होय. कारण कर्पूराची दीप्ती, हिच्या शरीराचा मृगमदापेक्षा श्रेष्ठ सुवास इतर कोणत्याही स्त्रियेपासून निर्माण होणं शक्य नाहीं. तसंच राघवाच्या चरणी एकनिष्ठतेनं भक्ती करणान्या बिभीषणाची कन्या त्रिजटा जवळच उभी आहे. हा सर्व देखावा पाहून असं वाटतं –
पद. (विराटवदनापासुनि०)
ध्यानस्थचि ही जनककन्यका अचल शांत मननी गढली ।
वाटे रविच्या आगमनीं जणुं तेजोत्सुक प्राची वसली ॥
किंवा पीडित तिमिरें रजनी शशिसाठीं उत्सुक झाली ।
राष्ट्रोन्नति वा धर्मोन्नतिची विश्वशक्ति ही तपिं रमली ॥
राघवरमणी मन विचारी पारतंत्र्यबंधनकालीं ।
स्वातंत्र्याचा भास्कर रघुपति कधीं उगवतो याच स्थलीं ॥ १ ॥
- आतां आपण गुप्तरूपानं जवळ जाऊन मातेच्या चरणांचं वंदन करावं.
[तसें करून जवळ मुद्रिका ठेवतो व आपण उडी मारून एका झाडावर बसतो.]
क्रूरवदन०-- (मध्येंच थांबून) प्रख्यात शूरवीर रावणसैनिकहो! बंदोबस्त तर नीट आहे ना?
शतमूर्ख० -- क्रूरवदना, आपली बंदोबस्त ठेवण्याची शिस्त त्रिभुवनांतील कोणत्याही देवदानवांना आजपर्यंत साधली नाही. तेव्हा काळजी करण्याचं काही कारण नाही. का? अधोमुखा, तुझी बाजू कशी काय आहे?
अधोमुख० --- अगदी चोख, आपल्याला पहाऱ्यावरचा आता कंटाळा आला बुवा.
क्रूरवदन०-- ठीक, दूताची कामगिरी नको, म्हणून या पहाऱ्यावरच्या कामावर प्रहस्त प्रधानजीनी तुझी नेमणूक केली. आता याहि कामाचा तुला कंटाळा आला वाटतं? मग काय दे गाय जोगवा करण्यांत तुला सुख मिळणारसं दिसतं?
अधोमुख० ---तो जोगा पत्करला पण
शतमूर्ख० ---पण? पण काय? अधोमुखा, सेवकांची वृत्ती पाहून त्यांच्या श्रमाचं खरं चीज याच लंकाराज्यांत होत असतं, हे पक्कं ध्यानात ठेव. [सीतेकडे पाहून] ही बया आपल्या समाधीतून उतरत आहे वाटतं?
क्रूरवदन०-- समाधी उतरल्यावर रडायला सुरवात होणार. हिला रावण महाराज बलात्कारानं वश करून कां घेत नाहींत कोण जाणे?
सीता०--(ध्यानस्थ)
पद० (कोन गली गयो०)
हरुनी बंध ललना मुक्त करा ॥ धृ० ॥
काय दशा ही तनुची झाली मद्विरहें रमणा ।। रघुकुलजा ॥ १ ॥
श्रमतां फिरुनी शोधित मजला कोण चुरील चरणा ॥ २ ॥
संतत मज जो आश्रय घडला तो कर- ॥ ३ ॥
-- अगबाई! [जागृत होऊन] करांगुलीवर आज ती दिव्य अवतार मुद्रिका का बरं दिसत नाहीं? [पुढे मुद्रिका पाहून] अगंबाई! हीच ती मुद्रिका. हा काय चमत्कार? मुद्रिके
पद० (प्रियकर माझे०)
जिवलग सखये सांगे झडकरी त्यामुनि कां
रमणा स्थलिं या ॥ रघुतिलकांचें कुशल
वदे गे वसत प्रभू कवण्या ठाया ॥ धृ ॥
नाथा वनिं विरहाची । ज्वाला तापद किति
जाची ॥ सौमित्राते त्यागुनिया अशी अरसिक
तूं येशी वनि या ॥ १ ॥
क्रूरवदन०-- कां ए बया? रडायला काय झालं? सांगतें ते नीट ऐक नाहींतर
जन्मभर रडं लागलंच आहे नशिबाला.
अधोमुख०--रडत रडतच का होईना, परंतु त्या महात्म्या रावणाची कामेच्छा तृप्त कर. (स्व.) धिःकार असो मला! काय कुशब्द मी बोललों.
शतमूर्ख०--खबरदार रडण्याचें जर बंद न केलंस तर या शस्त्रानीं तुझ्या शरीराचे तिळ तिळ तुकडे करूं. त्या नीच रामाचा नाद सोडून रावणाच्या गळ्यात माळ घालायला काय झालं? [शस्त्र उगारतो.]
त्रिजटा०-- चुप रहा मेल्या. मी इथं आहें हे दिसत नाहीं वाटतं? डोळे फुटले? माझ्या देखत असला अत्याचार कराल तर प्राणास मुकाल. मेल्यांना लहान थोर काहीच कळत नाही. चांडाळ, पापी! सीताबाई, चला आपण दुसरीकडे जाऊ.
[दोघी जातात.]
क्रूरवदन०-- थांब, शतमूर्खा थांब. हिला प्रथम या खड्गाचा प्रताप दाखवितों. ही पोरटी त्रिजटा जवळ आहे. नाहीं तर- [अंगावर धावून जातो तोंच मारुती समोरून येऊन त्याला खालीं पाडून त्याच्या उरावर बसतो. ]
मारुती० -- नाहींतर काय? त्रैलोक्यातील सर्व देवदानवांवर वचक ठेवणारे प्रबळ सैनिक हो! नाहींतर काय? बोल? मशका, तुझ्या नरडयावर हा ठोसा अस्सा मारून- (ठोसा मारून. क्रूरवदनास ठार करतो. ] या अधोमुखाची टांग धरून त्याला आकाशांत-
अधोमुख०-- मी गरीब आहे. निरपराधी आहे. मी आर्यावर्तयासी आहे.
मारुती०-- कोण? आर्यावर्तवासी? मग या अधर्मी राक्षसांची वृत्ती पत्करून पतिव्रतेचा असा अपमान करतोस? धिक्कार असो तुझ्या जन्माला! ते काही नाही. तुला या क्रूरवदनाप्रमाणंच यमाच्या घरची वाट धरलीच पाहिजे. बोल श्री राम- [ठार करतो. शतमूर्खास उद्देशून]- ए हरामखोरा-
शतमुख०-- (स्व.) आमची भरली. (उ.) मी शतमूर्ख नावाचा गरीब-
मारुती० -- तोडांतून शब्द काढ किंवा काढूं नकोस. तूही ठार झाला पाहिजेस. अयोध्येचा नायक श्रीराम याच्याविरुद्ध तुमच्या तोंडांतून एक शब्द मला ऐकूं आला पुरे कीं, तुमची सर्वांची नरडी या माझ्या हातांनी बळकट आंवळून पलिकडच्या या भयंकर तुफानी महासागरांत जलसमाध दिल्याशिवाय हा रामभक्त मारुती कधीही राहणार नाहीं.
शतमुर्ख० -- बाबा मारुतीराया, मी तुझ्या त्या श्रीरामाला शरण आहें. मला मारूं नकोस. मी मेल्यावर माझी बायको फार रडेल आणि एखाद्या राक्षसाबरोबर पुनर्विवाह करील. मग मी मेल्यावर हें कृत्य कांहीं मला पाहवणार नाहीं. मी तुलाहि शरण आहें. कृपा कर. हात जोडतो. पाया पडतो. नांक घासतों.
मारुती० --जा तुला जीवदान देतों. चल जा चालता हो येथून, [तो जातो.] पुन्हां आपण आपल्या वृक्षस्थानी जाऊन बसावं हे बरं. [तसे करतो.]
त्रिजटा०--(प्र.क.) अगबाई! इतक्यांतच या पहारेकऱ्यांना मरून पडायला काय झालं?
शतमूर्ख० ---- (प्र.क.) ते काही आपखुषीन मेले नाहीत बरं [विप्र भक्षकाला खूण करून बोलावतो. तो भीत भीत येतो. दोघे क्रूरवदनास ओढीत नेतात परत येतात.]
- स्वतःच्या खुषीवर मरण असतं. मग जगांत एवढा शंखध्वनि कोणीच करता ना.
[मारुती दरडावतो.] जातोरे बाबा यमराया! मोठे उपकार केलेस [अधोमुखास नेत असता] चला हो अधोमुख महाराज. जातों बरं कपिराज. पुन्हा मेलो तरि अशोकवनात पाऊल ठेवणार नाही. [जातो.]
त्रिजटा०-- कुबुद्धीचं फळ कधीहि चांगलं मिळायचं नाही. पापाचरणाची मसलत द्यायला लाज नाही वाटली मेल्यांना ।
सीता०-- (प्र. क) बाई मुद्रिके, सरयूतीरविहारी रघुवंशाचा नायक सांप्रत कोणत्या स्थली आहे बरं? सर्व सृष्टीचं नियमन करणाऱ्या आरक्त भास्करा!या प्रचंड भूगोलावर तूं आपली दृष्टी फेंकित आहेस, तेव्हां तूं तरी मला माझ्या श्रीरामाचं वास्तव्यस्थळ सांग. गगनमंडळांत स्वैर गतीनं उड्डाण करणाऱ्या खगगणानों! शौर्याबद्दल व ऐश्वर्याबद्दल ज्या रघुकुळाची कीर्तिदुंदुभी या त्रैलोक्यांत एके वेळीं मोठ्या धडाक्यानं गाजली असून, जिचा प्रतिध्वनी आमच्या शत्रूंच्या कर्णांत शिरून त्यांच्या राक्षसी ह्रदयांनां अजूनहि भीतीनं थरथरा कांपायला लावीत आहे. त्याच कुळाचे नायक वीर या मेल्या मदोन्मत्त रावणाला उलथापालथा करून माझ्या मुक्ततेसाठी काही प्रयत्न
करतांना तुम्हांला कुठे तरी दिसत आहेत का? चराचर स्थावर जंगमाला स्पर्श करून या प्रचंड ब्रह्मांडांत तीव्र वेगानं संचार करणाऱ्या वायुराजा, माझा प्राणविसावा धनुर्धर राम कोणत्या स्थलीं आहे याची वार्ता तूं मला सांगशील काय? काय? नाहीं सांगणार? नका सांगूं. तुम्ही सारे देवादिदेव, नवग्रह, पंचमहाभूतं सर्व शक्तिमान असतांनाही या मेल्या रावणाचे दास झालात, तेव्हां मी विचारतें त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कशाला द्याल! आपल्या पूर्वपराक्रमाची आठवण होतांच ज्यांच्या रक्ताला क्रोधाची उकळी फुटत नाहीं, धि:कार असो त्यांच्या जन्माला!
त्रिजटा०-- (स्व.) यांच्या या शोकाची आतां अगदी परमावधी झाली बाई । आपण
तरि काय करावं? (उ.) सीताबाई—
पद० (वारी जाऊ रे.)
वारी ताप मनाचा सारा सोडी शोकछाया || धृ |
म्लान वदन तव मन्मन दुखवी ।
सतत रुदन सत्पंथ न सुचवी ।
थोर मनें झणिं धरी आंवरुनी संकटा या ॥ १ ॥
निटिल-लेखे तो टळे न कांही।
कर्मगतीचा प्रवाह वाही- ।
निर्झर जलसम परि मन आपुलें शांतवाया ॥ २ ॥
सीता०-- त्रिजटे, मी मनाचं शांतवन तरि कस करून घेऊ? जेव्हां पहावं तेव्हां-
पद० (सुध बिसर गई.)
नित रममरण मनिं होत आमुच्या सुगतिचेही ॥ ५० ॥
गत वैभवांधार । तापदचि कांतार । करुनी छळी फार ।
मम पतिस तो विरहिं ॥ १ ॥
श्रेष्ठ जे बहुगुणी । वैभवाते त्यजुनि । राजसुत येति वनिं ।
क्रांति मन जाचितहि ॥२॥ योद्ध्या कुणी कधीं न ।
नगरी विभवपूर्ण । गाजे जगति जाण । ऐश्वर्य साचेहि ||३||
त्रिजटा०-- ते सारं खरं सीताबाई. पण सांप्रतची परिस्थिती किती उलट झाली आहे, पहातां ना? तेव्हां अशा वेळीं आपल्यासारख्या माणसानं धीरच धरला पाहिजे म्हणजे अनुकूल काळ येतांच सर्व मनोदय पूर्ण होतील.
सीता०--त्रिजटे, मी धीर तरी धरूं कसा? आणि तो कोणत्या आशेवर धरावा?
पद० (तव मानस कैसें.)
नव संकट निपजे हाय । दिवसेंदिवस कसें ॥
वनी छळिती अवघे नीच जन हे विरहीं असे ॥
व्यथित हृदय हें प्रखर वन्हिचा साहिल कैसा ताप हा ॥
बलात्कार तो रावण करि मग नष्टचि आपोआप ॥
तारक कोणी नसे ॥ १ ॥
त्रिजटा०-- सीताबाई, पण आशेला एक मार्ग आहे, नाही असं नाहीं, आणि तो मात्र सर्वसिद्ध असून त्यावर कोणत्याही मदांध सत्ताधीशाची सत्ता चालूं शकणार नाहीं.
पहा-
पद० (धीमा धीमा चालो.)
सत्य तत्त्वास पाळितो । प्रभू धर्मा
सत्कर्मास राखितो ॥ अती तापद खल-कुमति
पदीं तोच तुडवितो । न्याय दावितो || धृ० ॥
॥ चाल ॥ रावण खल तो, अधर्म वरुनी सुजन गांजितो ॥
धर्मा वाली आशेलागीं तारक कोणि न तो ॥
धर्मग्लानीस हानीस रक्षणा करी । सत्यतेजास-
अरुणास क्षितिजावरी । पसरि तिमिरारि ईशरवी
पूर्वगिरिवरी ॥ तिमिर लोपतो ॥ १ ॥
-- श्रीरामचंद्रजी तुमच्या मुक्ततेसाठीं कांहीं तरी प्रयत्न करीत असतीलच.
मारुती० -- (स्व.) त्रिजटा अगदी खरं बोलली.
सीता०--- मग ही मुद्रिका-
त्रिजटा०--ही कुठली?
सीता०-- चंद्राच्या शीतल किरणांना आणि अरुणाच्या आरक्त तेजाला दिपवून टाकणारा शामवर्ण जो माझा राम, त्या भाग्यवानाच्या करांगुलीवर ही नित्य झळकत असे. आज मानसिक पूजनाच्या वेळी करांगुलीवर मला दिसली नाहीं. डोळे उघडून पहाते ती की इथं.
त्रिजटा०-- ही मुद्रिका इथं कशी आली?
सीता०-- कोण जाणे! हिला या ठिकाणी येण्याइतकी चेतना जर प्राप्त झाली तर मी विचारते त्याचें उत्तर तिला कां बरं देतां येऊ नये? मुद्रिके, तू का बोलत नाहीस? तुझ्या आगमनानं मी शुभाची कल्पना करूं की अशुभाची! पण तूं ज्याअर्थी मुळींच बोलत नाहीसे त्याअर्थी माझ्या जिवलग रामानं विरहामुळें प्राण दिला हेंच खास. आणि तसं जर नसेल तर नाथा रामचंद्रा इथवर येऊन---
पद० (माझ्या मनीचे०)
भार्या वधुनी निजकरिं रामा मुक्तचि करि तिजला ॥
कैसे विपिनी नाथाविण मी साहूं प्राणाला ॥ धृ ॥
पंकजनेत्रा! अभिषेकाची स्मृति जाळी हृदया ॥
स्वयंवराचें शौर्य तसे मखरक्षण या समया ॥
दीनोद्धारा! झडकरि तारा नत मी तव पायां ॥
विरहवह्निने जाळुं नको मज विनवित ही अबला ॥ १ ॥
--दशकंठरिपु रामा! ही मुद्रिका तूं काय कारणानं पाठविलीस बरं? मृगत्वचेची कांचोळी मला पाहिजे असा माझा हट्ट हाच मुळीं अन्याय. त्यासाठी केलेलं सौमित्राचं छलन माझ्या हृदयात आता एकसारखं डांचत आहे. जे साधूंचा छळ करतील ते माझ्याप्रमाणं राक्षसांच्या हाती सापडून विरहानं तडफडत अधोगतीला जातील. राम--
(शोकाकूल होते.)
मारुती०-- (एकीकडे) आतां शोकाची परमावधि पहाण्यात अर्थ नाहीं. आता गायनाला आरंभ करून आपलं आगमन मातेला सूचित करावं झालं०—
पद० (कृष्ण मुरारी०)
राम विहारी मम दैवत धरणिवरि ॥ परम पुरुष
प्रगटुनि निज प्रखर स्वरूप कायधारी ॥
जनन मरण स्वकरिं धरुनि स्वपदि शरण
दास तारि ॥ धृ० ॥ सूर्यकुलज दयाब्धि पद्म
संभवधारि प्रभु सतत भक्तभजनिं नित्य
समिप राहि ।रामह्रदयकुमुदसुरसस्वादभुक्त
प्रभुचरणरजिं नित नत सेवक वनिं येई पाहि ||१||
सीता०-- (शोक आंवरुन ) अगवाई, कुठं आहे तो माझ्या रामाचा सेवक? [वृक्षाजवळ जाऊन] हे वृक्षा-
पद० (सोच समज०)
जनन तुझें धन्य तें । विटपारे || रामभजन
तव वदनीं मधु तें ॥धृ.॥ मनें करूनि जो
रामा भजतों । संकट कधिंही न स्पर्शित त्यातें ||१||
हे रघुभक्ता पुनित जनन तव । धन्य त्रिलोकी
वंद्य चरण ते ॥२॥ दाखिव मजला भक्त असा
तो । वसत तुझ्यांतचि गात भजन तें ||३|| ---
--[कोणी उत्तर देत नाहिंसें पाहून] अगबाई कोणीच कांही बोलत नाहीं? ही तर सारी कपटी राक्षसी माया दिसते. हे रामस्मरण करणाऱ्या भक्ता, तूं प्रगट होऊन मला जर आतां भेट दिली नाहींस तर मी आपला प्राण कांहीं ठेवणार नाहीं. अयोध्यापति रामचंद्रा! तुझी भेट मला आतां नाहींच ना?
पद० (आन बान जीयाम०)
प्राणनाथ विरहिं त्यागी । अबला सति मी ।
न तारक मज । पालक नच ||धृ०॥ त्वदिय
योगभजनिं रमति । भक्त तारण्यास रमसि ।।
शशिविण जशि कुमुदिनी तशि झुरत मनिं
अभागी ||१||
--आतां असंच करावं. [गळ्याला वेणीचा फांस घालते.]
मारुती०-- (स्व.) आतां ही तर वेणीचा फांस घेऊन प्राणत्याग करणार. मग माझ्या येण्याचं सार्थक तरि काय? छट्, ती पहा अगदीं तयार झाली. उशीर नको. [झाडावरून खाली उतरतो. ]
त्रिजटा०-- अहो सीताबाई हे काय करतां?
सीता०-- जानकीरमणा रामा! अंतीं तुझं स्मरण तरि पावन करो
मारुती०-- [पुढें येऊन नमस्कार करतो.] जयजय रघुवीर समर्थ.
सीता०-- [फांस काढून स्वगत.] अगबाई, हाच तो रामसेवक वाटतं? (उ.) वत्सा
चिरायू हो
मारुती०-- माते जानकी, कल्याणरूप रघुवीर किष्किंधेला सुखरूप आहे. मी वायुपुत्र हनुमंत रामचंद्राचा सेवक असून तुझ्यासाठीं सर्व लंका धुंडाळीत आलों आहें.
सीता०-- ( गहिंवरून) हनुमंता या तुझ्या उपकारांनी मी-मला-एक शब्द बोलवत नाहीं. (डोळे पुसून] श्रीराम खुशाल आहे ना? तिकडची सारी खुशाल?
मारुती०-- माते जानकी, श्रीरामान जटायूचा उद्धार करून कबंध राक्षस ठार मारला. वालीला मारुन त्याच्या जागी सुग्रीवाची स्थापना केली. आणि तुझ्या स्वातंत्र्याची उत्कट महत्वाकांक्षा धरणारी अपार वानरसेना जमवून प्रभु रामचंद्र इकडंच येण्यास सिद्ध झाले आहेत. मातोश्री तूं आमची-आमच्या आर्यावर्ताची राजलक्ष्मी आहेस. तुला या लंकाद्वीपस्थ राक्षसांच्या जाचांत ठेऊन स्वस्थ बसण्याइतके आम्ही रामभक्त आजच इतके निःसत्व झालों नाहींत माते! काय सांगू-
पद (गज विशी०)
प्रभु साहतसे मनि विरहव्यथा || विरहाग्नि
तया करि त्रस्त सदा ॥ करि आर्तरवा
स्मरुनी सीता ||१|| पाषाण हृदीं धरि शोकरसें।
समजूनि तुला त्या भेटतसे ॥ मुळीं शांति
नसे प्रभुच्या हृदया ||२||
- मातोश्री तूं जे अलंकार मार्गात टांकलेस ते मी रघुवीराला नेऊन दिले. ते पाहून त्यानीं जो आकांत केला तो या मारुतीला कांहीं सांगता यायचा नाही. श्रीरामाचा आक्रोश पाहून वनदेवतासुद्धां धाईधाई रडतात. इतकंच काय, पण माते
दिंडी.
त्यजुनी बाळातें जननि जशी जाई ॥
बाळ शोकाकुल वाट तिची पाही ।
तसा लक्ष्मण तव चरणदर्शनातें ॥
होय उत्कंठित झुरत मनीं माते! ||१||
सीता०-- माझ्या जीवलग रामाला माझ्याकरितां काय हे परिश्रम? हनुमंता. आम्ही त्रिवर्ग अयोध्येहून इकडं येत असतां चालतां चालतां वाटेत मी जर थोडी मागं राहिलें तर प्राणनाथ लागलेच एकाद्या दाट वृक्षाच्या छायेखाली माझ्यासाठी थांबत. आणि ` सीते, तुला किनै फार श्रम होतात ग, काय बरं लाडके करू : असं म्हणून तोंड कुरवाळायचे—
मारुती०-- गाते, शोकातिशयामुळे कशाला श्रमी होतेस, तुझ्या दुःखाचे व बंदिवासाचे दिवस नष्ट झालेच असें समज. इतकंच नव्हे तर या ब्रह्मचारी वायूनंदनाचं हे वचन लक्षांत ठेव की आर्यावर्ताची राजलक्ष्मी तूं सीता- इतः पर या चोरट्या राक्षसांच्या प्रदेशांत न राहतां, आम्ही तुला परत नेऊन, मोठ्या थाटामाटानं अयोध्येच्या जगप्रसिद्ध सिंहासनावर स्थापन करणार. माते, या पापी लंकेचा व मदोन्मत्त रावणाचा समूळ विध्वंस करायला श्रीराम येथे लवकरच प्राप्त होतील.
सीता०-- लवकर म्हणजे केव्हां? पहा—
पद० (अवचित गेले०)
धैर्यचि नच तिळ मातें वनिं या ॥
करिति सतत छल बहुपरि हे खल राक्षस प्रतिदिनिं ||धृ०||
रामा कळवी बंधनछळ हा या परदेशी सोशित
ललना ॥ सत्वर संकट-ताप हरुनी मज करि
पुनितचि झणिं ||१||
मारुती०--उदयीकच श्रीराम येथे येतील. रघुवीरानं मला फक्त सीताशुद्धीचीच आज्ञा केली आहे. नाहीतर या मारुतीनें त्या अधम रावणाला त्याच्या सिंहासनावरून खाली ओढून तुझ्यासमक्ष लाथ मारून ठार केला असता.
सीता०-- अगबाई, मारुती तू प्रथम मला सूक्ष्मरूप दिसलास, पण आता किती भयंकर हैं तुझं स्वरूप झाले?
मारुती०--हे माते! तूं माझा पराक्रम अझून पाहिला नाहींस, आम्ही रामभक्त सूक्ष्म रूपांत कृश शरीराचे जरि दिसत असलो तरी शत्रूचा कंठ काडकन फोडतांना आणि त्याच्या गर्विष्ट छातीवर मुष्टिचे दणक्यावर दणके मारतांना या शरिरांतील सर्व नसा पार टरारून जातात.
सीता०-- खरंच. माझा यावर विश्वास आहे. पण श्रीरामानीं तुला कांही अंतरखूण सांगितली आहे का?
मारुती० - होय मला त्याचं अगदीं विस्मरण झालं होतं. माते. तुम्ही त्रिवर्ग वनवासाला निघाला असता रघुवीरानं कैकयीच्या महालात आपल्याला वल्कलं नेसविली होती. पटते का ही खूण?
सीता०—न पटायला काय झालं परंतु हा माझा बंदीवास लवकर संपेल असं काहीं तरि करा.
मारुती०--- त्याची काळजीच करू नका. जगन्माते, किष्किंधाभुवनांत नळ, नीळ, जांबूवंत, सुग्रीव असे प्रत्यक्ष कृतांतकाळाचे शास्ते रघुनायकाची सेवा करीत आहेत.
सीता०--ते सर्व महावीर विजयी होवोत. पण मारुती, तूं हा एवढा प्रचंड महासागर कसा उल्लंघन करून आलास कोण जाणे.
मारुती०-- माते पुन्हा रामकृपेनें, तुझ्या आर्शीवादाने आणि या दिव्य अवतारी मुद्रिकेच्या सहाय्यानं काय होणार नाहीं? असो. मी आतां फार श्रमलों आहे. थोडी विश्रांती घेऊन पुन्हा थोडयाच वेळांत तुला येऊन भेटेन. जय जय रघुवीर समर्थ.
[जातो.]
प्रवेश २ रा.
स्थळ :- इंद्रजीताचा दिवाणखाना,
[विचारात गुंतलेली सुलोचना प्रवेश करते.]
सुलोचना---
पद. (काय पुरुष.)
हाय! प्रळय तापद भारी । त्रस्त करित लंका नगरी ।
वीर सर्व हरले समरीं । काय गति कळे ना ||१||
देव दैत्य ज्यानें हरिले । चंद्र सूर्य सेवक केले ।
श्वशुरही सुमतिस मुकले । अंत नच बरा त्या ||२||
-काय होईल तें होवो. सध्यांची ही स्थिती काही चांगली नाही. आम्हा बायकोकडे तरी काय दोष? नि आमच्या हाती आहे तरी काय? येऊनजाऊन पडल्याझडल्या पुरुषांच्या तोंडाकडं पाह्यचं पण ते तरि सुधे पाहिजेत ना!
पद० (अंकित पदांबुजाची.)
मानसिं तया मदांधा न सुचे। हें सत्य तत्त्व
ईशा रुचे । हें ॥धृ॥ त्यजुनी मार्गा नीतीच्या
त्या । अनीतिपथ करि घात त्यांचे ||१|| सत्या
ईश्वर रक्षण करितो । असत्य तिळ नच
त्यास सहतें ॥२॥
- पुरे झाले हे विचार! नुसतं विचारच करूं लागल्यास त्यांची पायरी कुठवर जाईल नि कुठवर नाहीं! ( उ ) कोण आहे ग तिकडं?
दासी०--- (प्र.क.) जी सरकार. मी आहे.
सुलोचना०--- स्वारी कुठं गेली इतक्या जलदीन? मोठ्या महाराजांनी बोलाविलं कीं काय?
दासी०-- होय सरकार. आपलं मंगलस्नान चाललं असतां रावण महाराजांकडून दूत आला. त्याच्या बरोबर आपले महाराज तातडीनं निघून गेले नि नुकतेच पालखीतून परत येऊन शस्त्रागारात शिरले.
सुलोचना ०--- काही युद्धाची गडबड आहे की काय?
[इंद्रजीत युद्धाच्या वेषाने प्र.क.]
इंद्रजीत ०--- होय. युद्धाचीच गडबड आहे.
[सुलोचना दासीला जाण्याची खूण करून आपण दूर उभी रहाते.]
इंद्रजीत०-- (स्व.) हिचं मन कांहीं तरी विचारांत गढून गेल्यासारखं दिसत आहे. बहुतकरून या विचाराचे तरंग सध्याच्या परिस्थितीबद्दल असतील. परंतु त्या बंडखोर मर्कटाला युद्धांत चिरडून टाकण्यासाठी आजची ही माझी स्फूर्ती, युद्धसामुग्री आणि भावी विजयश्रीचं माझ्या प्रफुल्लित चेहऱ्यावर चमकणारं हे तेज पाहून हिला आनंद झाल्याशिवाय खास राहणार नाही. (उ) अशी दूर उभी कां? तू माझ्याकडे नीट न्याहाळून पहा बरं एकदां? सुलोचनेच्या महालांत विश्रांतीसाठी येणारा आजचा हा इंद्रजीत नव्हे, माझ्या पोषाखावरून-
सुलोचना०-- पोषाखच कांही पाह्यला नको. माणसाचं मन शुद्ध नसलं म्हणजे कोणाच्याहि सहज लक्षांत येतं. विश्रांतीसाठी सुलोचनेचा महालच आतां काय करायचा आहे? सध्यांच्या प्रळयांत आम्हां स्त्रियांची कितीही विटंबना चालली असता. नुसतं पोषाखाचं आणि वैभवाचं प्रदर्शन करून पुरुषांनीं आम्हां स्त्रीवर्गाबद्दल इतकं बेपर्वा रहावं यांत आपल्याला काय दोष द्यायचा? आमचं नशीब
इंद्रजीत० - पण जरा-माझं—
सुलोचना०--- काय बाई कालचा तो अनर्थ
पद० (लोफूल जानी०)
कपिवीर मार्गी आला । ललनांसि छळितां झाला ॥
कांताविना त्या कांता । आकांता करी। भारी । आकांत
होय भारी ||१|| परि वीर सारे दडले नरवीर
सारे हरले ॥ करि फार ललना-छलना । तिळ ना लाज ती ।
पुरुषा । तिळ लाज नाही पुरुषा ॥२॥
इंद्रजीत०-- मी काय म्हणतों तें तर-
सुलोचना०--- या अनर्थांत गांजलेली एकादी सुंदर स्त्री सत्तेच्या जोरावर धरून आणून तिला पट्टराणी, मनमोहिनी, हृदयविलासिनी, जीवनदेवता यापैकीं एखादा मान द्यायचा असेल. माझी कांहीं हरकत नाही बरं!
इंद्रजीत०--- मला असल्या वितंडवादाची भारी चीड आहे. मी इथे आलो कोणत्या स्फूर्तीनं आणि तुझं आपलं पहातो तो शुष्क चऱ्हाट सुरू. लंकानगरींत एवढा आकांत चालला असतां. तिकडे कानाडोळा करून ऐश्वर्यांत झुलत स्वस्थ बसण्याइतके आम्ही राज्यचालक गाजी बनलो नाही, समजलीस?
सुलोचना०--[जवळ जाऊन] मग त्याबद्दल इकडं काय व्यवस्था करायचं ठरलयं!
इंद्रजीत०---ती व्यवस्था काय, हें माझ्या पोषाखाकडं पाहिल्यास सहज कळेल. म्हणून मघांशी मी म्हटलं` हा माझा पोषाख पहा; तो तू आपलं उलटंच चऱ्हाट सुरू कैलंस.
सुलोचना०---एकूण स्वारी त्या माकडाचा वध करायला सेना घेऊन जाणारसं दिसतं.
इंद्रजीत०--- युद्धासाठी सज्ज असलेल्या वीरांना असल्याच गोडगोड सस्मित हास्यशकुनांची आवश्यकता प्रथम असते. मला आतां आनंदानं निरोप दे पाहूं. म्हणजे हां हां म्हणता विजयी होऊन शत्रूच्या रुधिरानं माखलेल्या छातीनं या वीरांगनेला आलिंगन द्यायला मी लवकर परत येईन.
सुलोचना०--ही मी तयार आहे. आंत चलायचं म्हणजे पंचारती ओवाळतें.
[जातात]
प्रवेश ३ रा
स्थळ :- रावणाचा खासगी दरबार
पात्रें :- रावण, प्रहस्थ, मंत्री वगैरे.
रावण०-- प्रत्यक्ष इंद्र देखिल ज्याच्यापुढे हार टेकून समरांगणांत शरण आला, त्या माझ्या इंद्रजीत पुत्रापुढे त्या कपीचं काय सामर्थ्य आहे. त्या बंडखोर माकडाला तो अगदी घुंगगुरट्यासारखा चिरडून टाकील माझ्या इंद्रजिताची सेना किती बलाढ्य---
पद - (लाल झालि कोपानें०)
शूर अशा चतुरंग सनिकां मम सुत तो घेऊनि गेला ॥
अमित आयुतें मत्त करीदळ ठार करिल सहजीं कपिला ॥धृ.॥
रथा न गणये कुणा अश्व ते सबल जाणती युद्धकला ॥
सैनिक शीर्ये ` मारुं मरुं वा ` वदति सहज वधिती त्याला ||१||
--अशा बलवंत वीरावर एका क्षुल्लक कपीनं विजय मिळवणं शक्य तरी आहे कां? जंबुमाळी राक्षस ठार मारला मारूं द्या. आसाळी राक्षसीण पोट फाडुन मारली, मारूं द्या. पण प्रधानजी, हे पक्क लक्षात ठेवा की आजच्या मोहिमेत तो माकड ठार झालाच पाहिजे.
दरबारस्थ०-- ठार झालाच पाहिजे झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. आणि तो होणार पण.
[सर्वभक्षी घाबन्या घावन्या प्र.क.]
सर्वभक्षी०-- राजाधिराज घात झाला. अशोकवनांत इंद्रजीत युवराजांच्या प्रचंड सै न्याचा पार फडशा ऊडाला. आपले युवराज नग्न होऊन पळाले ते एका विवरांत दडून बसले घात झाला.
रावण०-- काय? माझ्या इंद्रजिताचा पराभव झाला? त्या काळतोंड्या माकडानं माझ्या युवराजाचा पराजय केला? आणि तो मी कानांनी ऐकत असतांहि स्वस्थ बसू काय? ज्या या रावणानं खडतर तपश्चर्या करून हे लंकापद प्राप्त करून घेतलं; ज्याच्या सेवेंत पंचमहाभूतें हीचशी काय, पण इंद्रादी देवसुद्धा राहत आहेत, जो मी लंकाधीश नवग्रहांच्या उरावर पलंग ठेऊन त्यावर निद्रा करणारा आणि क्षणांत सप्तपाताळ हालवून सोडणारा त्याच्याच युवराजाला एका क्षुल्लक माकडान नग्न करून विवरांत पळवावं काय? काय हा अंधाधुंदीचा प्रकार! प्रधानजी, कुठे आहे तो सृष्टी उत्पन्न करणारा ब्रम्हदेव!
प्रहस्थ०--तो बसला असेल पंचंग चाळीत.
रावण०--- त्या हरामखोराला इकडे आणा पाहू.
प्रहस्थ०--अरे ए ब्रह्मा-ब्रह्म! चल इकडे ये.
ब्रह्मा०--- (प्र.क.) महाराजाधिराजांची काय आज्ञा आहे? आज्ञा व्हावी की या
सेवकान बजावलीच.
रावण०---आणि न बजावलीत तर पाठीवर रट्टे बसल्याशिवाय राहतील वाटतं । मुम्ही माझे सेवक-दास आहांत, आणि मी लकाचीश रावण तुमचा धनी आहे. देव असलात म्हणून काय झाल! कामांत कसूर झाली की उना जाळून पोळून खाक करीन. समजलांत!
ब्रह्मा०--- (स्व.) विनाश काले विपरीत बुद्धी. (उ) महाराजाची काय ती आज्ञा व्हावी.
रावण०--आताच्या आत्ता जा आणि अशोकवनाचा विध्वंस करणाऱ्या त्या कपीला बांधून आणा. नाही तर तुमची गती ठीक होणार नाही.
ब्रह्मा०--- ठीक आहे आणतो. (स्व.) काय ही आम्हां देवादिकांची दुर्दशा! कर्मभोग भोगल्याशिवाय सुटायचा नाहीं. आता मारुतीचं स्मरण केल पाहिजे. [तसे करतो मारुती येतो. ]
मारुती०--ब्रम्हदेवा! काय आज्ञा आहे?
ब्रम्हा०--- (त्याच्या कानांत काही सांगून) महाराजाधिराज हा पहावा तो कपी.
[जातो.]
रावण०-- (स्व.) हरामखोरा, या रावणाच्या हातून तू आता जिवत सुटशील काय?
प्रहस्थ०--कायरे ए द्वेष्ट्या माकडा बंडखोरा! तूं कोणाचा कोण आहेस?
रावण०--आणि तूं आलास कोठून हेही सांग? सांगतोस किं नाही?
मारुती०-- या सर्व लंकेत इतका प्रलय होत असताही मी कोण आहे हे तुम्हांला न समजण्याइतका तुमचा सत्तामद शिखराला पोहचला आहे काय? रावणा, ज्या धनुर्धरानं जनकराजाच्या दरबारांत सीतास्वयंवरसमयी तुझ्या गर्विष्ठ छातीवर दडपून पडलेलं भव्य शिवधनुष्य उचलून तुझा प्राण व अब्रू वाचविली आणि त्याच प्रचंड धनुष्याचा प्रत्यंचा चढवीत असतां त्याचे काडकन दोन तुकडे करून सर्व सभाजनांसमक्ष ज्यानें आपल्या अतुल पराक्रमाची झांक सर्वांना दाखविली त्याच वीराचा मी दास आहे. ज्यानें ताटिका सुबाहूला यमाच्या घरची वाट दाखवून विश्वामित्राच्या पवित्र यज्ञाचें रक्षण केलें त्याच वीराचा मी दूत आहे. त्रैलोक्यपतित्वाची घमेंड मारणाऱ्या रावणा, ज्या महात्म्यानं तुझ्या भगिनीचं नाक कान कांपून टाकले त्याचा मी दासानुदास तुला शिक्षा द्यायला इथं आलों आहें. चोरा, पाकशाळेत ज्याप्रमाणं श्वान शिरतो त्याप्रमाण मिक्षेची झोळी पसरुन पंचवटींतील पर्णकुटिकेतून माझ्या मानसदैवताची राजलक्ष्मी तूं चोरून आणलीस काय? त्या रामसिंहाची वस्तु तुला जिरणं आता शक्य नाहीं.
त्या सीतेच्या मुक्ततेविरुद्ध तुझ्या किंवा कोणाच्याही तोंडातून एक अक्षर जर मला ऐकू आलं तर रावणा, लक्षांत ठेव-हे तुझे धूर्त बुद्धीचे शहाणे प्रधान, हे तुझे मंत्री आणि हे तुझे प्राणरक्षक प्रबळ सैनिक, या सर्वांच्या समक्ष तुला या टरारलेल्या मनगटाचा एकच ठोसा मारून नरकाच्या मार्गांत दूर झुगारून देईन. यांच पट्ट्यानं तुझा अखया राजपुत्र ठार मारून, अशोकवनाचा विध्वंस केला आणि याच रामसेवकान त्रैलोक्यात प्रबळ म्हणून गाजलेल्या तुझ्या राक्षससैन्याचं पीठ करून इंद्रजीत म्हणून शचीपतीच्या पराजयाबद्दल शेखी मिरवीत असलेल्या तुझ्या राजपुत्राला नग्न करून एखाद्या बायकोप्रमाणं विवरात दडून बसायला लावलं.
रावण०-- शूर राक्षसांनो, तुमच्या अजिंक्य शस्त्रांनी याच्या सर्व शरीराचें चूर्ण करा पाहूं.
मारुती०--हां हां रावणमहाराज आपण इतकी तसदी घेण्याचं काही कारण नाहीं. आपल्या राक्षसवंशाचा विध्वंस करायला कौसल्याकुमार सहपरिवार इकडंचं येत आहेत बरं!
प्रहस्त० - मूर्खा, कोणाच्यापुढे तूं या बाष्कळ वल्गना करीत आहेस?
रावण०--प्रधानजी, या माकडाच्या नादी लागण्यांत कांही अर्थ नाही. पण त्यानंही पक्क लक्षात ठेवावं कीं, आमची साम्राज्यशक्ती इतकी बळकट व प्रज्वलीत आहे की सीतेच्या मुक्ततेबद्दल.
मारुती०--(आंगावर धावून जातो.) रावणा, तोंडांतून शब्द पडतो न पडतो तों तूं ठार मेलास म्हणून समज.
ब्रह्मा०--(प्र.क. मारुतीला आवरून धरतो) हां हां हां मारुती, वाल्मिकाच्या वचनाला बाध आणू नकोस. रामाच्या हस्ते-बस्- इतकंच शांत हो.
(जातो.)
रावण - अरे जा माकडा. वैभवाबद्दल आणि सामर्थ्याबद्दल बाष्कळ वल्गना करण्यांत तुझा किष्किंधावासी मर्कटाप्रमाणे आम्हाला भूषण वाटत नाही समजलास? दूता-कोण आहे तिकडं? या हरामखोराच्या सर्वांगाला अग्नी पेटवून हालहाल करून याचा प्राण घ्या.
(मारुतीला दूत पकडतात.)
मारुती० --पण त्यांत एक भानगड आहे. अग्नीनं सर्वांग पेटवाल. पण शेपूट जरा का उघडं राहिलं तर मात्र मी आटपणार नाहीं. लाथेखालीं चिरडून टाकीन सगळ्यांना याद राखून ठेवा.
रावण०-बरं बरं (दूतांस) तोंडाकडे काय पहाता? न्या त्या माकडाला ओढीत.
(दूत मारुतीला नेतात.)
रावण -- (स्व.) शक्तीपेक्षां युक्ती श्रेष्ठ आतां लवकरच अशोकवनांत जाऊन त्या मनहरणी सीतेचं मन कसे तरी वळविलंच पाहिजे. अहाहा! त्या सीतेसारखी यौवनसंपूर्ण स्त्री या त्रैलोक्यात मिळणं शक्य नाही. स्वयंवरसमयी मी त्या शिवधनुष्याखाली दडपून पडलों, परंतु त्या सुंदरीच्या सौंदर्यतेजाकडे पाहूनच मी तो भरदरबारातला अपमान सहन केला.
(सर्वभक्षी घाबरत प्र. क.)
सर्वभक्षी०--महाराज-महाराज-महाराज. वस्त्रांचा पर्वतप्राय ढिगार संपला, महासागराप्रमाणं तेल संपलं पण पुरवठा होत नाही. त्या माकडाचं शेपूट भसाभस वाढतंय काय करावं ते हुजूरास-
रावण०-- त्यांत विचार तो काय करायचा? चल माझ्याबरोबर अशोकवनांत, सीतेला नग्न करून तिची वस्त्र तुम्हांला देतो. चल!
(जातो.)
प्रहस्त० -- या लंका नगरीची आतां काहीं धडगत दिसत नाहीं. या अपशकुनांचा शेवट काय होईल तो होवो. आपलें लंकाबेट सोडून आर्यावर्ताच्या दंडकारण्यांत याचकवृत्तीनं जाऊन ती सीता पळवून आणली ही गोष्ट कोणत्या थराला जाईल ती जावो. या माकडानं भावी स्थितीचा ओनामा आताच सांगितला म्हणायचा. जे जे होईल तें तें पहाणे भाग आहे.
(आंतून " आग लागली. धावा " असा ओरडा होतो. )
अरे हा गलबला कसला? ऑ? अरे अरे अरे! त्या माकडानं सगळ्या लंका नगरीला आग लावली. खरोखर लकेवर कल्पांतरुद्र कोपला! अरे घाबरू नका-घाबरू नका. हा पहा मी आलो. आग विझवा-आधीं आग विझवा.
(जातो.)
प्रवेश ४ था
स्थळ : अशोकचन
पात्रें : सीता, मारुती, त्रिजटा.
सीता०--हनुमंता, ही त्रिजटा माझ्याजवळ आहे म्हणुनच या अशोक वनांत माझे बंदीतले दिवस कसे तरी मी कंठीत आहे. ही एक उल्हासवृत्तीची व शांतीची कामधेनू आहे. नाहीतर या राक्षसी प्रदेशांत माझ्या विरही मनाला कशानंही समाधान झालं नसतं, हेच पहा-
पद. (उगिच कां०)
मुळींच ना आता मानसा शांती आतां ॥ धृ० ॥
प्राप्त होय शोक अशोकीं ॥
रम्य उपवनीं अवलोकीं ॥
पोळितो मला विरहीं कीं ॥
सृष्टि फुलुनि तापवि चित्तां ॥ १ ॥
--खरं जर म्हणशील तर त्रिजटे, स्वतंत्रतेचा एक क्षण पारतंत्र्याच्या अनंत काळाबरोबर आहे.
त्रिजटा०-- म्हणुनच दासांनी दास्यत्वाचे दिवस कडक पावित्र्यानं व मनोनिग्रहानं कंठून दास्यमुक्ततेचा मार्ग शोधीत असावं. सर्व पृथ्वीवर अनर्थ करून राक्षसी अनाचारांनी निरपराध्यांना त्रस्त करायचे पापी व स्वार्थी विचार राक्षसांच्या जरी मनात असले तरि पण सीताबाई! जगन्नियंत्या परमेश्वराची इच्छा कांही निराळी असते बरं.
मारुती० -- त्रिजटा अगदी योग्य बोलली.
त्रिजटा०--हा सर्वसिद्ध नियमच आहे. कारण—
पद० (मम चित्त सरो०)
प्रभू धन्य सज्जनवाली । तारक स्कंध भू सांभाळी ॥धृ.॥
अधर्महननी असत्यछेदनि कुबुद्धिमर्दनि स्वरूप धरुनी ॥
उचलित सज्जन झडकरि करताळिं ॥ १ ॥
मारुती०-- बरं माते, मला आता लवकर निरोप दे म्हणजे उदईक दोन प्रहरी रघुवीरासह सर्व रामसैनिक भी लंकेंत घेऊन येईन.
सीता०--मी अंतरखूण तुला सांगितलीच आहे. पण मुद्रिकेप्रमाणं हा माझ्या
वेणींतील दिव्य मणी श्रीरामास नेऊन दाखिव आणि सांग –
पद०(सुनी वो बालग०)
झणिं या तारक रामा ॥ धृ० ॥
विपिन पडले नाहीं कुणि वाली ।
राक्षस छळिती त्यातें वधण्या ॥ १ ॥
वरह पोळितो भारी सतिला या ।
सिंचुनि प्रणया ललना सुखवा ॥२॥
अंक दुसरा समाप्त.
प्रवेश १ ला
स्थळ: पंपा सरोवराजवळील प्रदेश..
पात्रें : राम, लक्ष्मण, जांबुवंत
राम०-- प्रिये जानकी—
पद० (सतनु करावा०),
दिगलित आंगी भेटशि कां गे तुजसाठी विपिनीं फिरतां ॥
मूर्तिमंत तूं भेट एकदां तोषवि झणिं कांते कांता ||१||
सिंहकटी ती कटिस्मृति देई मृगाक्ष तव नयना दावी ॥
रंभास्तंभा पाहुनि मजला स्मृति ऊरुंची ती होई ॥२॥
वृक्षलता मन विव्हल करिती तव बाहूसम त्या दिसती ॥
ऐसे सारे एकवटुनियां विश्व विरहतापा देती ॥३॥
लक्ष्मण०--दादा, व्यर्थ शोक करण्यात काय पर अर्थ? पहा--
पद० (सुनइ दिल्दार०)
असे वनवास सांप्रत हा कठिण भारी ॥
धैर्य मनि थोर धरा अघ घोर हे वारी ॥
निटिल लेखापरी घडते कृती जगतीं ॥
त्यजुनि शोका विवेकातें धरा हृदयी ॥ १ ॥
-पूर्वी आपण युवराजपदारूढ़ होतो. संपत्तीचा, वैभवाचा आणि राजलक्ष्मीचा पूर्ण उपभोग घेत होतो याची नुसती कल्पना करणं ह्मणजे सध्याच्या स्थितीत एक निद्रेतील
स्वप्न वाटतं!
राम०-- आपल्या नशिबाचे खेळच कांहीं विचित्र आहेत. पहा—
पद०(जातसे पतिसदनि०)
आठवे दिनरजनिं मजला बंधुजन आप्तावली ॥
तनय-विरहें ग्रस्त सदनीं पुनित जननी आपुली ॥
त्यागुनी युवराजपद तें विपिनिं सहतों कष्ट हे ॥
तातदचना सार्थ करण्या व्यापिली तनु वल्कलीं ॥ १ ॥
-- तातज्ञेप्रमाणं हा वनवासही गोड मानून कंदमुळांवर निर्वाह करून रहात असताहि हा सीतावियोगाचा प्रसंग आमच्यावर यावा यापेक्षां खडतर नशिबाची आणखीं सीमा ती कोणती! पहा—
पद० (तेंडेरे कानुमेमेंडेरे०)
विकल हृदय विरह करित हा ॥ अरि हरि
सहचरि प्रिय मज ॥ धृ० ॥ विरहीं तुटली
हृदय-ऐक्यता । करुनी खंड द्वय । विकल० ॥ १ ॥
विपिनी पडुनी अर्थ तळमळे । झुरत दुजे
भलतिकडे ॥ विरह० ॥ २ ॥
लक्ष्मण०-- दादा, या भावी संकटांचं मला स्वप्नच पडलं होतं नि म्हणूनच सुवर्णमृगाच्या कापट्याबद्दल मी मातोश्रींची समजूत घालण्याचा यत्न केला परंतु माझ्या दुर्दैवानें त्या समजूतीचा शेवट विपर्यासात झाला. सीता मातोश्रीला राक्षसांनं पळवून नेली असं जटायूनं सांगण्यापूर्वीच मी त्या गोष्टीबद्दल तर्क केला. कारण—
पद० (भेदिती गृहभेदि०)
दावुनी खल विविध आमिष ॥ छळिति सज्जन
ते बहुपरि ||धृ०॥ वांछिती परनारि लाभा ।
करिति ऐशा धर्मलोपा । यज्ञ विध्वंसोनि ऋषिनां ।
ताप देती ते परोपरि ॥ १ ॥ रूप मोहक घेति
कधिंकधिं । मधुर वचना बोलताती ॥ करिति
हतबल पाश टाकुनि । क्रौर्य वरिती सज्जनांवरि ॥ २ ॥
- पण त्यानींहि पक्के लक्षांत ठेवावं की आमच्या नैसर्गिक सात्त्विक वृत्तीचा अयोग्य लाभ घेण्याचा सल्ला देणारी त्यांचीं तीं कपटी शिरं आम्ही रामभक्त भरसमरांगणांत तुडवून जमीनधास्त केल्याशिवाय खास रहाणार नाहीं. या मायावी राक्षसांचा पूर्ण निःपात केल्याशिवाय आमच्या पवित्र यज्ञयागादि क्रिया सुरळीत चालायच्या नाहीत, आमच्या सनातन धर्माची प्रज्वलता प्रखर राहणार नाही नि आमच्या क्षत्रियत्वाच्या तेजाला आमचे वंशज नावें ठेवल्याशिवायहि राहणार नाहींत.
राम०-- शाबास लक्ष्मणा शाबास!
पद० (जणुं गांठियली०)
तव वचन गमे परिसचि मम या म्लान
मनालागीं ॥५०॥ ख्यात रघुकुला वीरश्री
ती भूषविते ||१|| करि अरिहनना उत्सुक
मज तें पियुष गमे ॥२॥
-परंतु अस पहा, सीतेचा शोध लागल्याखेरीज आमच्या आयुधांचा व शौर्याचा काय उपयोग?
जांबुवंत०-- आयुधांचा व धनुष्यबाणाचा उपयोग स्वारीनां जर सध्या करायचा नसेल आणि क्षत्रियत्वाचं तेज दाखविण्याची सवड स्वारीला जर सध्या नसेल तर तीं आयुधं व से तेज अस्मादिकाच्या स्वाधीन करावं.
लक्ष्मण०--पण त्याचा उपयोग करणार कुठं?
जांबुवंता०--त्याचीहि योजना या बुद्रुक डोक्यानं करून ठेविली आहे. आपला या वनांतील वनचर स्नेही इथंच कुठं तरी एकाद्या झुडपांत असेल, तो त्यांचा नीट प्रतिपाळ करील. वनचरा-ए वनचरा-
वनचर०--- (आंतून) ओ-ओ-ओ आजोबा. वाँईच थांबा. मी सीतासुद्धी करीत बसलोया न्हवका?
जांबुवंत०---अरे शहाण्यामूर्खा-मठ्ठपंडिता. इकडं ये आधी. म्हणे मी सीताशुद्धी करीत आहें! तोंड पहा सीताशुद्धी करणाराचं.
वनचर०--( हातांत चिलीम घेऊन प्र.क.) हो बघा माझं त्वांड!
राम०--वनचरा, दंडकारण्यापासून तू आमच्या सहवासांत आहेस, तेव्हां तूं तरि सीतेचा पत्ता सांगतोस का?
वनचर०--हो बघा ही बया लई इचित्र हांय बघा, हिच्यामंदी भवानी संकराचा ह्यो जलाल इस्तुव तिच्या टकुऱ्यावर ठेवला आन् योक सपाटून दम मारला का-यो बघा-बघा-भपकारा. आन् आता सांगू-सांगू? सांगू? वं भोलानाथ दिगंबर! उत्तरच्या बाजूला त्वांड करूनशान दक्षनच्या बाजूला मुखडा फिरवला कां उगवत बाजूला मावळत समिंद्रातल्या लई लई लान बेटामंदल्या लई म्वाठ्या डबक्यामंदी सीता अशी अशी पोहत व्हती बघा!
राम० --- वनचर आहेस झालं!
वनचर०--- न्हाय कोण हानतो? पन् सीता ह्मंजी हाय काय, त्येची दखल हाय कोनच्या लेकाला? सीता ह्मंजी पुरूस हाय का बाईल हाय का जनावर हाय त्ये त्या भोलानाथाला ठावं!
जांबुवंत ०-- गप् बैस मूर्खा.
वनचर०--मंग ह्याचं आपलं ह्येच झालं म्हनायचं!
राम० -- मारुतीची भेट झाल्याशिवाय माझा हा विरहसंताप कांही कमी होणार नाही.
प्रिये सीते!
पद० (कशी वद आस करूं०)
छळि मज ताप तुझ्या विरहाचा निराशा आटवि
धैर्यधि साचा ॥ धृ० ॥ कल्पतरूपरी बहुगुणी असतां
अंगीकृत गुण कैसा लपला ॥ कां न पुरविशी हेतू
आतां तुजविण राहूं ऊंचा ॥ १ ॥
--लक्ष्मणा, माझ्या सीतेची व मारुतीची भेट झाली असेल काय?
लक्ष्मण०-- दादा--
पद० (कपोला कपोलाचि०)
चिरंजीव त्या अंजनीबालका । नसे भीति कालत्रयीं आयका ॥
प्रतिकार त्या जो मदानें करी । अरी तो पडे तो सत्वरीं यमकरीं ॥
यशाची ध्वजा शोभते ज्या करीं । यशवंत येईल तो लवकरीं ॥ १ ॥
राम०--मग त्याला माझ्या जानकीची क्षेममकुशलता विचार बरं?
लक्ष्मण०--पण दादा अझून मारुती आलाय कुठे? तो येतांच मीच त्याला हा प्रश्न
प्रथम विचारीन.
राम०--हरहर! तोपर्यंत मला धीर कुठला?
साकी.
नसे शांति ही विरहि मनाला प्रिय रमणीविण कांहीं ॥
सृष्टिनियम हा मनुज देवकृतिग्रंथ न मनुजा दावी ॥
ना तरि स्पष्ट कळे । कोठें कर्मप्रवाह ढळे ॥ १ ॥
[" जय जय रघुवीर समर्थ `` गर्जना ऐकू येते.)
वनचर०--आर इचिमन हो काय लचांड आलंया?
आं? हो काय हाय तरि काय? टोळधाड आली न्हवका! आरतिच्या, तर समदी
माकडे दिसत्यात.
जांबुवंत०--मूर्ख आहेस. निवळ गलेलठ्ठ रानटी टोणगा मला नीट पाहू दे. (सर्व पाहूं लागतात.)
वनचर०--हां आजोबा, मग जरा वॉंईच्च थांबा. ह्या माझ्या हिचा एक झणझणीत
गरमागरम—
जांबुवंत०--गप् बैस.
वनचर०-- भोलानाथाची वल्ली हाय न्हाय म्हणूं नका.
जांबुवंत०--प्रसाद पाहिजे वाटतं?
वनचर०-- नको तर नको.
(पुन्हा गर्जना होते.)
जांबुवंत०--असे तो पहा-तो पहा वानरांचा प्रचंड समुदाय आकाश मार्गानं उड्डाण करीत येत आहे.
वनचर०-- आन् त्यो मघला हुप्या टोळभैरव कोण?
जांबुवंत०--} अरे तो तर आमचा हनुमान मारुती.
लक्ष्मण०--}अरे तो तर आमचा हनुमान मारुती.
जांबुवंत०--आपला उजवा हात उभारून रामनामाचा जयघोष करीत इकडंच येत आहे. राम०--यावरून कार्यात सिद्धी मिळाली हेंच खास-
दिंडी.
चिन्ह विजयाचें दर्शवी करानें ॥
सवें घेउनियां कपिगणा त्वरेनें ॥
वायुनंदन ये मिळवुनी यशाला ॥
विजयिभव हा वर सफल गये झाला ॥ १ ॥
(वनचर आगांत आल्यासारखे करतो.)
जांबुवंत-- अरे हा बेटा वनचर असा कां करूं लागला?
वनचर--( घुमत घुमत) माज्या आंगामंदी या आपल्या याचं-ईरशिरीचं-वारं आलय न्हवका. अरे मला कोनीबी वळखत न्हवतं आँ? पन ह्मनावं बघा आता माजा हा. अरे हरामखोरा, आतां तुझा हा माझ्या पुरा ध्येनामंदी आलाया. चोरा, आमच्या ह्याची ही तूं ही करून न्हेली व्हतीस न्हवका? आता आमास्नी तिचा हा लागलाया. तुजा हा उगवायला ह्ये माजं हो फुरफुरूं लागल्याती. अरे हे ह्या! तुला ही ही करायला पाहिजे व्हय? अरं मर्दा-न्हवं मुर्दाडा, तू इचिमन काय समजलास? तुझ्या या ह्याच्यावर- मानगुटीवर ही माझी ही अशी मारूनशान तुला ठा-आ-आ-र ( आरोळी मारतो.)
(मारुती, सुग्रीव, नळ, नीळ जयघोष करून प्र. क.)
राम--मारुती उठ -
पद. (लाविलि थंड उटी)
भट संख्या झणिं मजसि मारुता कंवटाळूं दे विजयि तनूला ।।
कार्यश्रमीं तनु घर्मजलानें भिजलि चुंबुदे या काला ॥
अचल भक्ति वी प्रसन्न मज करी काय उपकृती करुं मी तुजला ।
आनंदाश्रुजलीं करि स्नाना प्रेमवसन घे परिघानाला ॥ १ ॥
लक्ष्मण-- हनुमंता, या तुझ्या कार्यसिद्धीबद्दल न् स्वामीभक्तीबद्दल तुझी स्तुती करावी तितकी थोडीच होणार आहे. पहा--
पद. (अर्पिलें सुमन)
तब शोधकार्य साफल्य पाहुनी ताता ।।
प्रभुभक्ति जननिच्या चित्ता ॥
देईल मोद हनुमंता ॥
धन्या न अन्या कुणा भक्ति साजे ॥ १ ॥
जांबुवंत--आता हा शिष्टाचार सध्यां राहूं द्या. त्याबद्दल मारुतीला जो एक मोठा धन्यवाद द्यायचा तो मी-अस्मादिक जांबुवंत-मागाहून देतील. सध्या इष्टकार्यसिद्धीचे मृत ऐकायला हे पहा आमचे कान टौकारून पहातां पाहतां लांबच लांब बनत चालले आहेत.
वनचर--ही चिलिम सांगते मला । ही बया बोलते मला । दम मारुन सोडि भप् कारा ॥ आरडून ओरडून सांगा आता ॥ काम झालि हो खबरबात || जय बं भोलानाथ.
राम--सख्या मारुता-
पद. (गोपाल गिरिधार)
सांगे सकल वृत्त ॥ करि शांत मम चित्त ॥
क्षणि या उचंबळत ॥ परिसण्या विजय तव ॥धृ.॥
मेघापरी गहन । गमत मज तव वचन। वृष्टी झणीं
करुन । कर्णचातक सुखवि ॥ १ ॥
मारुती-- रामचंद्रा, अपयशाची काय बिशाद आहे कीं तें या रामभक्ताच्या स्वामिकार्यांत प्रतिकार करील. मी इथून उड्डाण करून लंकाद्वीपांत गेलों; तिथं जो वृत्तांत घडला तो ब्रह्मदेवानं या पत्रांत साद्यंत लिहून दिला आहे. सीतामाता अशोकवनांत सुखरूप आहे—
वनचर--पण काय हो-
जांबुवंत--चुप. मध्यें बोलू नकोस.
वनचर-- न्हाय ह्मटलं त्या वनामंदिं गांजा मनमुराद हाय का?
मारुती-- चित्रकूट पर्वतावरील पर्णकुटिं आपण सीतामातोश्रींच्या कपाळी रेंखलेंला मनशिळाचा तिलक ही अंतरखूण जानकीनं आपणाला सांगितली आहे. त्याचप्रमाणं हा दिव्यमणी मातेनं आपल्या वेणींतून काढून आपल्याला दाखविण्याकरितां दिला आहे.
राम-- (मण्याला हृदयाशीं धरून) बा मण्या!
साकी.
सीता स्पर्शसुखा अनुभवुनी धन्य जन्म तव केला ॥
परि हतभागी रमण तियेचा शोकीं पार बुडाला ॥
देइल कोण अतां । शांति संचित हृत्प्रांता ॥ १ ॥
मारुती- (स्व) सीतेलाच झपाट्यासरशी आणली असती तर फार बरं होतं! पण रामाची आज्ञा नाही.
लक्ष्मण-- दादा—
पद. (नशिब फिरले)
धैर्यगिरि गमतां । मग उदास कां हो होता? ॥धृ.॥
भास्कर नच तेजा त्यागी ॥
चापल्य न वायू त्यागी ॥
गिरि चले न स्थिर ज्या जागीं ॥
शौर्यनिधि असतां ॥ मग. ॥
मारुती-- खरंच--
ऋषिमख रक्षाया शौर्य जें गाजवीलें ॥
॥चाल ॥ खलजनहननीं जें तेजही दाखवीले ॥
गौतममुनिजाया उद्धरोनी यशाला ॥
अनुपम जनिं केली कीर्ति ऐशी विशाला ॥
लक्ष्मण-
परि धरा धैर्य या समया ॥
यशचिन्ह करा नच वांया |
सैनिकदळ विजय वराया ॥
सिद्धचि असतां ॥ मग. ॥ १ ॥
जांबुवंत -- बरं, श्रीरामा ब्रह्मदेवांनी पाठविलेल्या त्या पत्रांत काय लिहिलं आहे? बाकी मारुती ह्मटला हाणजे बाळ मोठं आहे विचित्र.
राम-- एकंदरीत सर्व लंकाराज्य ह्मणजे अनीतीचं माहेरघर आहे असं या पत्रात स्पष्ट लिहिलं आहे. ठीक आहे. तुमच्यासारख्या स्वामिभक्त सैनिकांच्या सहायान मी ती लंकानगरी हां हां ह्मणता उध्वस्थ करीन. तसंच ब्रह्मदेवाने सर्व देवादिकांच्या बंदीवासाचं वर्णन यात फारच हृदयद्रावक लिहिल आहे. देवादिकांची इतकी दुर्दशा ऐकून त्यांना बंधमुक्त करण्यासाठी कोणत्या क्षत्रियांचे धनुष्यबाण आपल्या भात्यांतून बाहेर पडल्याशिवाय राहतील? कोणत्या योध्यांचे दंड शत्रूला जमीनदोस्त करण्यासाठी फुरफुरल्या वांचून राहतील? नि कोणता सनातन धर्माभिमानी या अधर्मी राक्षसांचा कंठनाळ काडकन् फोडण्यासाठी सज्ज होणार नाही? कां सेनापती कसा काय विचार?
सुग्रीव-- विचार तो आणखी कसला? आपली आज्ञा होण्याचा अवकाश कीं त्या नीच रावणाला या माझ्या शूर सैनिकांच्या सहायानं त्याच्या लंकाराज्यासह पार उध्वस्थ करीन. आतां उशीर लावण्यांत कांहीं अर्थ नाहीं. विजयादशमीचा सुमूहूर्त उद्यांच येऊन ठेपला. तेव्हां कोणत्याहि प्रकारची दिरंगाई न लावतां शत्रूवर एकदम चाल करून जावी हेंच इष्ट दिसतं.
जांबुवंत-- रघुवीराचा मूळपुरुष रघु हा याच विजयादशमी श्रवण नक्षत्रावर दिग्विजयाला निघत असे.
सर्व सैनिक-- हो. असंच केलं पाहिजे. शुभस्य शीघ्रम्.
नळ--त्या रावणाचं थोबाड फोडून सीतादेवीला मी एकटा मुक्त करणार.
नीळ-- सीतामुक्तीचं काम मी कोणाच्याच वाटणीला येऊ देणार नाही. हा नीळ एकटाच त्या उन्मत्त रावणाला धोंपटून धोंपटून ठार करणार.
वनचर--(अंगांत आल्यासारखें करून) आर इचिभन मी इकत्या वेळ हा बसलों होतों. पन माज्या याची ही कोनालाबी येनार नाहीं. अरं मला वाँईच याची ही द्या. मारे या माज्या ह्या वर सारूनशान त्या हरामखोर या आपल्या ह्याचा पार हा उडवूनशान टाकतो. मी पचा लइ म्वाटा हा हाय. अर हे ह्या-थांब. तूं पळतूस कुठं? तूं कुठंबी हे करूनशान बैस. तुला ही मारूनशान तुझा हा करीन. जय बं भोलानाथ.
जांबुवंत--मी जरि तुह्याला थेरडा दिसत असलों, तरी या सुरकुतलेल्या मनगटांत इतका पीळ अझून भरलाय की एका ठोशासरसा त्या रावणाला उलथापालथा लोळवीन समजतात. राजलक्ष्मीची मुक्तता या - या ठोशांत भरलेली असते बरं. यदाकदाचित् तुह्मी तरूण पोरांनी कट करून रावणवधाचं काम माझ्या वाट्याला येऊन दिलंच नाहीं, तर पाषाणांचा रचतो एक भला मोठा ढीग आणि बसतो जाऊन त्या रावणाच्या राजवाड्यावर. राक्षस दिसलारे दिसला की हूं:! केला जागच्याजागी गार. आधी राक्षस ठार मारल्याशिवाय यमलोकांत रावणाची व्यवस्था ठेवायला दुसरे प्रामाणिक सेवक कुठून मिळणार?
लक्ष्मण--नळ नीळ जांबुवंता तुमच्या शौर्याची आज आह्याला नव्यानेच परीक्षा पहावयाची आहे असं नाहीं.
राम--खरोखर-
पद. (कशि मदनमूर्ति)
तुह्मि प्रखर भानु रणभूमिचे ॥
हो जनन सफल इह लोकिंचे ॥धृ.॥
स्वामिसेवनीं दक्षचि गमतां ॥
कृतांतराम यशस्फूर्ती वरितां ॥
वाटे मुक्तचि कराल सीता ॥
यश झणिं घ्या रणभूमिचें ॥ १ ॥
सर्व--वाटतं का? केलीच समजा, ती आमची वंद्य राजलक्ष्मी माता आहे. (सर्व उठतात.)
राम-- हा तुमचा उत्साह पाहून मनाला फार आनंद होत आहे. सैनिकहो तयार व्हा. दंडकारण्यांत भिक्षुकाच्या वेषानं प्रवेश करून ज्या अधर्मी राक्षसानं तुमची राजलक्ष्मी सीता चोरून नेली. त्याला या जगांत अनीतीचा शेवट किती भयंकर असतो हें दाखविण्यासाठीं व सीतेची मुक्तता करण्यासाठीं तुह्मी सज्ज व्हा. ज्या ब्रह्मदेवानं ही सृष्टी सत्यासाठी निर्माण केली तोच ब्रह्मदेव आज तेहतीस कोटी देवांसह त्याच राक्षसाच्या बंदींत पडला असल्यामुळें त्यांची मुक्तता करण्यासाठी आणि त्याच पवित्र सृष्टीवर आजमितीस भडकलेला अधर्माचा व अनीतिचा प्रखर अग्नी पार नाहींसा करून टाकण्यासाठीं. तुह्मी एक दिलानं आणि एक मनानं आपले पाय इतक्या दणक्यानं आपटीत त्या शत्रूच्या छातीवर चाल करून जा कीं हा पृथ्वीचा गोल पार डळमळून जाऊन त्यानं पाताळाच्या शेषाचं मस्तक थरारून सोडलं पाहिजे. युद्धास तोंड द्या, अशी इषारत मिळतांच आपल्या हातांतील आयुधानी शत्रूंचीं शिरं इतक्या सफाईनं सपासप उडवा कीं तीं या भव्य गगनमंडळांत गर्रगर्र गिरक्यां खात राहून राक्षसी व अनाचारी तत्त्वानं चौर्यकर्म करणाऱ्या आपमतलबी राक्षसांची भावी स्थिती पुढच्या पिढीला स्पष्ट दिसेल. ज्यांना आपल्या स्वधर्माच्या इभ्रतीची चाड असेल, ज्यानां आपल्या बायकांची अब्रू मर्दपणानं राखायची असेल आणि ज्यानां माझ्या सीतेबद्दल राजलक्ष्मीचा अभिमान असेल त्यांनीं याच वेळीं दृढनिश्चयाची ऐक्यत्वाची ढालतलवार त्या लंकेच्या तटाला नेऊन भिडविण्यासाठी आणि त्या उन्मत्त रावणाला सहपरिवार धडकी मारून लंकेच्या राजद्वारांत चेंदून जमीनदोस्त करण्यासाठी माझ्याबरोबर समरांगणात धावत यावें.
सर्व-- जय जय रघुवीर समर्थ.
राम-- सैनिकगणहो! चला तयार व्हा. उदईक विजयादशमीच्या सुमुहुर्तानं लंकानगरीवर स्वारी करून आपली राजलक्षुमी सीता परत मिळवू. त्या उन्मत्त रावण राक्षसाचं सहपरिवार कंदन करून आपलं नांव जगाच्या पुराणेतिहासांत अजरामर करूं. बोला ऐक्यतेचा जयजयकार.
(सर्व जयघोष करून धांवत जातात.)
प्रवेश २ रा
स्थळ : अरण्य रस्ता.
पात्रें : विप्रभक्षक, सर्वभक्षी.
(समोरासमोर येऊन भेटतात.)
विप्र--रावणं वन्दे.
सर्व--रायणं वन्दे.
विप्र--अहो पण हो-हो जरा थांबा. काय राव अगदीं घोडयावर बसलात.
सर्व--- छे छे! तुमच्या ह्मणण्याप्रमाणं इथं बोलत उभा राहिलों तर मात्र खचित गाढवावर बसण्याचा प्रसंग येणार.
विप्र--पण जरा-थोडं. आज गडबड कसली आहे?
सर्व-- डोळे असून आंधळे आणि कान असून बहिरे आहांत झालं. आहो. आज सकाळपासून या लंकेंत इतकी गडबड सुरू असतांहि तुह्मी आपले कोरडे ठणठणीत.
विप्र -- पडलोच मुळीं गावाच्या बाहेर पहाऱ्यांवर तेव्हा कोरडा राहणं ठीकच आहे. आता गावातल्या गडबडीन आम्हांला ओलं करून भिजविलं नाहीं, तिचं नशीब -प्राक्तन-दुर्दैव. तुह्मी तरि आह्याला ओलाचिंब करा.
सर्व-- माझ्यापाशी बातम्यांचा इतका कांही हौद भरला नाहीं. आहे एक घागरभर बातमी. ओततो तुमच्या टाळक्यावर आणि करतों तुह्याला बातम्याभिषेक. भिजलात तर भिजलात. आज सकाळी असं झालं.-
विप्र-- कसं झालं?
सर्व--ती सीता धरून आणली आहे ना? तिला सामोपचारांनीं पुष्कळ सांगून पाहिलं. पण ती कांही रावणमहाराजानां वंश होत नाहीं. तेव्हां आतां शेवटचा उपाय-
विप्र-- मेजवानीचा?
सर्व-- (त्याला थप्पड मारून) मेजवानीचा! तुला दिसताहेत सदासर्वकाळ मेजवान्या त्या माकडानं एवढ्या मेजवान्या दिल्या त्या विसरलास वाटतं?
विप्र--अरे हो. तुला एक नवीन बातमी सांगतो ऐक.
सर्व- माझी गोष्ट तर ऐकून घे.
विप्र-- अँ:! त्यात काही अर्थ दिसत नाही. रावण सीतेपुढे जाऊन साष्टांग नमस्कार घालणार-
सर्व--त्याचा कान धरून) अरे मूर्खा पाया पडण्याचे दिवस जाऊन आतां तिच्या कानाला असं पकडून बळजबरीनं शयनशेजेला यश करण्याचा दिवस आजचा आहे.
विप्र--(विवळत) अरे पण मलाहि तुझ्या शयनशेजेला यश करतोस की काय?
सर्व-- वा! रत्नच पडलास की नाहीं? तुला बायको समजून शयनशेजेला वश करणाऱ्या प्राण्याच्या दोन्हीं डोळ्यांत वडस वाढले असले पाहिजेत.
विप्र-- पण मी इतका का हिडीस, ओंगळ, घाणेरडा आहे?
सर्व---आहांत मदनाचे अवतार. परंतु पुरुषांना पुरुषांशींच लग्न लावून जेंव्हा संसार करण्याचा काळ येईल त्यादिवशीं आपली, आपल्या सौंदर्याची जरूर लागेल बरं? आता नाहीं. येतो आता (जाऊं लागतो)
विप्र--अहो पण मुख्य बातमी राहिलीच
सर्व-सगळ्याच बातम्या सांगून संपविता उपयोगी नाहीं. त्याला नुकताच एक नवीन करार दरबारात तरला आहे, कीं रावणराज्यांत दरबारी बातम्या कुठंच बाहेर फुटतां कामा नये, त्या जो कोणी निष्कारण बाहेर फोडील त्याचे टाळकेंच फुटलें जाईल. ह्मणून त्या करारानुसार मी देखिल आज रावणाचा मोठा दरबार आहे. त्यांत सीताबलात्काराचा निर्णय व्हायचा आहे यांतील एक अक्षरहि तुझ्याजवळ बोलत नाहीं.
विप्र--आतां माझी बातमी ऐका. तो बंडखोर माकड आपल्याला माहीत असेल? निदान ऐकून तरी?
सर्व-- पाठीवर जोंपर्यंत फटकाऱ्यांचे वळ दिसत आहेत तोपर्यंत त्याचं स्मरण जगजाहीर आहे. बरं मग त्याचं काय?
विप्र-- तो माकड मेला ह्मणे.
सर्व- (स्व.) तरिच बेटा आतांशीं कुठं दिसत नाहीं (उ.) अहो मरायचाच. आपल्या या अजिंक्य व प्रबळ लंकाबेटांत असल्या या माकडांची काय मात्रा चालणार? मारे झोडपून टांकला असेल कोणी?
विप्र---नाहीं बुवा. तसं कांहीं झालं नाही, उलट त्या माकडानं तुमच्यासारख्यानां यथेच्छ झोडपतांना मात्र आम्ही पाहिलंय कां असंच ना?
सर्व---(ओशाळून) नाहीं नाहीं. असंच कांहीं नाहीं-पण मी काय विचारीत होतों पहा हो- आठवलं आज म्हणे रामेश्वराच्या किनान्यावर माकडांची सेना-
विप्र--किती? (भेदरतो.)
सर्व-- अगणित अशी येऊन धडकली. प्रत्यक्ष मी पाहिली. का? असे भेदरलात कां? विप्र--हो हो. आम्हीं काय भित्रे आहोंत वाटतं? (स्व) तो माकडाचा प्रसाद आठवला की पायजम्याची हूं:! ती हकीकत या मूर्खाला कशाला सांगा? गुप्त अपमान, गुप्त मुष्टीमोदक, गुप्त चापटपोळ्या नेहमीं गुप्त तिजोरीत गुप्तच ठेवल्या पाहिजेत.
सर्व-- कांहो तोड उतरलंसं?
मदिराक्षी--काय रे मेल्या? काय म्हणतोस?
सर्व-- आतां दरबारांत जाऊन सभामंडपाच्या खांबापुढं गाणार नाचणार वाटतं?
विप्र--छे: छे: तशांतला काही प्रकार नाहीं. येऊ द्या त्या माकडानां तर खरं, मंग पहातों त्यांचा समाचार. येतो आतां. रावण वन्दे (जातांना.) मी फक्त एका माकडाला भितो, लाखों माकडांना भितो कीं काय? (जातो.)
विप्र-- ( दूर पाहून) हां! ही चांगली शिकार आली हातांत. आतां आपली दूतगिरी चांगलीच गाजविली पाहिजे.
(मदिराक्षी वेश्या महिरापात्र घेऊन प्र. क्र.)
सर्व-- कायग ए गांवभवानी? दरबारची वेळ तुला ठाऊक नाही वाटतं? तुला बोलावण्यावर बोलावणी करायला तुझ्या बापाचा मी नोकर आहे वाटते?
मदिराक्षी-- कां? एवढं खेकसायला काय झालं? मेल्या माझ्या बापाचा नोकर नाहींस पण ज्याच्या नोकरीवर पोट जाळतोस त्याचा तर नोकर आहेस ना? चल हो पुढं. ही मी दरबारांतच चालल्यें (जाऊं लागते. )
सर्व--अहो-अहो तडफडाबाई-अहो मुरकाबाई-अहो मधुर नरड्याच्या लालबुंद डोळ्याच्या मदिराक्षीबाई इकडं या इकडं या आधीं.
मदिराक्षी--(घाबरून) म्हणजे?
सर्व-- म्हणजे काय? दरबार कधींच आटंपला. तूं दरबारांत हजर नव्हतीस म्हणून प्रहस्थ प्रधानजीची तुझ्यावर अगदीं खप्पा मर्जी झाली आहे.
मदिराक्षी--खरंच का हें?
सर्व--खोटं असेल तर मेल्यावर माझे डोळे फुटतील.
मदिराक्षी--मग आतां?
सर्व-- आतां काय? माझ्या म्हणण्याप्रमाणें करशील जिवंत तर राहशील. नाहीं तर त्या प्रहस्थ प्रधानजीच्या शिक्षेच्या तडाक्यांतून तूं सुटायची नाहीस.
मदिराक्षी--सर्वभक्षे, मी तुझं काम करतें पण--
सर्व- आता `पण` जाऊ दे मला त्या तुझ्या यांतला एक मधुर घुटकादे. राजकीय मदिरा भारी गोड असतें ह्मणे?
मदिराक्षी--ही हे. (ओतूं लागते.)
सर्व--ऊं:हू! मला तशी नको. आतां होतो रावण नि तू आपली मदिराक्षीच रहा. (राजाचें अवसान आणून ऐटींत बसतो.) हा पहा भी दरबारच्या सिंहासनावर बसलों. (स्व ) आह्मांसारख्या हलक्या दर्जाच्या दूतांनां वाटेल त्याला वाटेल ती थांप मारून वाटेल तसा गंडा घालतां येतो तो असा. (उ.) हं:! हा पहा भी आतां रावण झालों. आतां तू मुरका मारून मारून, पैंजणाच्या नादावर घुम छुम नाच नाचत गात गात मद्याचे पेले दे पाहू?
दिराक्षी--एकच पेला मिळेल. जास्त नाही.
सर्व-- (तीन बोटं दाखवून) निदान दोन तरि दे (राजाप्रमाणें मोठा आवाज काढून) हे कलावंतिणी, नृत्य गायनानं आमचं सुमन सुशांत कर.
मदिराक्षी--जी सरकार
सर्व--है मदिराक्षी, राजकीय मद्याचा तो हंडा आमच्या नरड्यांत सगळाच्या सगळा ओतून तृषा ऊर्फ तहान शांत कर, असा आमचा हुकूम आहे.
मदिराक्षी--जी सरकार (गाते व नाचते.)
पद. (जो पिया आयेना.)
मधुर वारुणी ॥ स्वर्ग साख्यास देइं नरा प्राशनीं ॥
तरुण जाया युवा जैं प्रिया ही जनीं ॥ धृ. ॥
निधिमंथनिंचें अमृत तया शक्ति नसे ॥ सुरा मुक्ति
नरा देइं करा श्री भासे ॥ तरुणिनयना हिची उपमा ||
कवीकल्पना देतसे जनीं ॥ १ ॥
(सर्वभक्षी रंगात येऊन तिच्याबरोबर नाचूं लागतो, तोंच विप्रभक्षक येऊन त्याला लाथ भारती मंदिरांशी पळून जाते.)
विप्र-- मूर्खा, तिकडं दरबार भरलाय आणि तूं इथं बसलास फाजीलपणा करीत? चल ऊठ.
सर्व- गाढवा, एकदम येऊन लाथ मारलीस? शरम नाही वाटतं? राग आला होता तर दोन चार थोबाडींत मारायच्या होत्यास. पण लाथ मारलीस म्हणजे काय?
विप्र--चल हो पुढं?
सर्व-- तूं हो मागं?
(जातात)
प्रवेश ३ रा
स्थळ : रावणीचा दरबार.
पात्रें : रावण, प्रहस्थ मंत्री, इंद्रजीत, बिभीषण.
(कलावंतीणीचा नाच झाल्यावर दूत प्रवेश करतो.)
दूत--महाराजाधिराज रावण त्रैलोक्यपतीचा जयजयकार असो.
इंद्रजीत -- कायरे दूता. काय बातमी?
दूत-- महाराज, अपार वानरसेना जमवून अयोध्येचा राम सागराच्या पलिकडे रामेश्वराच्या किनाऱ्यावर उतरला असून तो आपल्या लंकेवर लौकरच स्वारी करणार आहे. रावणं वन्दे (जातो.)
रावण--असं आहे काय? बरं आहे. प्रबळ लंकापतीच्या बलाढ्य शक्तीशीं विरोध करण्यात आणि अयोग्य स्थितींत आमच्या थोर खुशीच्या विरुद्ध जाण्यांत किती मूर्खपणा असतो, हें त्या मानवी रामाला आतां चांगलं कळलंच पाहिजे. दरबारस्थ मंडळी, ही बातमी तुम्ही ऐकलीच आहे. आणि जरी आमची सैन्यशक्ती अत्यंत प्रखर आहे, तथापि सर्प व अग्नी यांचा विश्वास कोणी द्यावा? श्रीविरुपाक्षाच्या कृपेन हें. लंकापद आम्हाला प्राप्त झालं आहे आणि तें अजिंक्य आहे याबद्दल आम्हांला फार अभिमान वाटतो. त्या विघ्नसंतोषी मर्कटांचा पुढारी तो मानव राम सहपरिवार आकळला जाऊन तो या रत्नजडीत सिंहासनाला शरण आला पाहिजे असा मंत्र तुम्ही शोधून काढा. त्या मर्कटान सर्व लंकानगरी जाळून ही वानरसेना चिथावून आणली आहे.
प्र. प्रधान-- महाराजाधिराज, मानवी सेनापतीच्या सेनापतित्वाखालीं ती मर्कटसेना लंकाद्वीप आमच्या वर स्वारी करणार काय? विरूपाक्षाचीच कृपा म्हणून हें भक्ष आयतेच आमच्या तोंडात येऊन पडत आहे. राजाधिराज, आपण तिळमात्रही फिकिर करूं नये. त्या माकडांना या लंकाद्वीपाच्या किनाऱ्यावर पाऊल तर ठेऊं द्या की रावणसाम्राज्यरक्षक प्रबळसैनिकांचा प्रताप त्यानां चांगलाच कळेल.
इंद्रजीत-- यांत काय संशय? सिंहाच्या भयंकर गर्जनेपुढें या मंडुकांच्या मंडुकध्वनींची प्रतिष्ठा ती काय? त्रैलोक्यपती बलाढ्य लंकापती कोणीकडे आणि त्या माकडांच्या माकडचेष्टांवर विश्वास ठेऊन नसता उपद्व्याप करणारा मानव राम कोणीकडे? मशकांसारखा चिरडून टाकूं.
बिभीषण-- वा! काय सांगावा तुमचा पराक्रम! पराक्रमाची बढाई करताना जिव्हेला कांहीं श्रम पडत नाहींत, पण कृतीची वेळ आली की हीच वाचाळता वेळी फिक्की पडते, समजलात? कपटी दुर्जनांनो या दशमुखांभोंवतीं जमून नसतों वितंडवाद व कुतर्कावर कुतर्क लढवितों याची तुम्हाला शरम कशी वाटत नाही? अयोध्येच्या त्या राजपुत्राला सर्व सेनेसह म्हणे मशकासारखा चिरडून टाकूं. इतक्या प्रबळ शक्तीचे महासागर जर तुम्हीं होतात, तर त्या कालच्या माकडाने एवढा प्रळय केला त्याचा रोमसुद्धा का वांकडा करविला नाही? सगळ्या लंकानगरीचा विध्यंस केला रावणाची सभा नग्न करून तिला दाही दिशा पळायला लावलं आणि असंख्य राक्षससैन्य कांडून कुटून फस्त केलं त्यावेळी आपण डोळे झांकून बसला होतात वाटतं? आता दिमाखाच्या गोष्टी सांगण्यात आणि पराक्रमाची थोरवी दाखविण्यांत दरबारांतमात्र मोठे पटाईत. मदांध रावणा! तू लंकेचा राणा आहेस, मोठा बलवंत आहेस, त्रैलोक्यपती म्हणून नित्य तुझ्या वल्गना चालतात. पण यावेळेस तरी अपाहार बुद्धीचा त्याग करून या विभीषणाचे चार शब्द ऐक.
रावण-- राजकीय सत्तेचा विरोध करणाऱ्यांना माझ्या दरबारातील प्रज्वलीत न्यायदेवता किती कडक शासन करते, याचा तूं-विभीषणा-प्रथम नीट विचार कर ; आणि नंतर या रावणानं कोणाचं काय अपाहार केलं आहे हे सिद्ध करून दाखविण्याची तयारी कर.
बिभीषण--- शहाणे लोक ज्या गोष्टी लपवून ठेवतात त्या मला स्पष्ट बोलून दाखविल्या पाहिजेत आणि ज्यामुळे मोठमोठ्यांच्या मनाला विषाद वाटेल अशा खऱ्या खऱ्या हकिकती मला उघड केल्या पाहिजेत. रावणा, एवढा मोठा प्रचंड सागर उल्लंघून, पुष्पक विमानाच्या द्वारे तूं जो आर्यावर्ताच्या दंडकारण्यांत गेलास आणि केवळ कावेबाजपणाने व भिक्षुकीच्या ढोंगान अयोध्यावासी राजपुत्राची पत्नी सीता तूं का पळवून आणलीस? तुझ्या मदांध कामाची शांती करायला तुझ्या ऐंशी हजार बायका तुला पुरेशा नव्हत्या कीं काय?
रावण--विरोधी विभीषणा! ज्याच्या अंगांत पराक्रम आहे, ज्याच्या नसानसांतून शौर्य खेळत आहे आणि ज्याच्या हातात विजयी शस्त्र झळकत आहे तो वीर या भूलोकासच काय, परंतु त्रैलोक्यासही काबीज करील किंवा आम्हा सत्ताधारी राजकीय मनाची लहर लागल्यास हा अमर्याद विश्वविस्तार आमच्या दास्यत्वात येऊन राहिला पाहिजे. अर्थात आम्ही विजयी राजे सीतेसारख्या अनेक वनवासी दासीना सुखोपभोगाकरितां आमच्या रंगमहालात आम्ही खेंचून आणूं. याच्या योग्यायोग्यतेबद्दल आणि पात्रापात्रतेबद्दल चर्चा करण्याचं विरोधी काम ज्याअर्थी तू आपल्या शिरावर घेतलं आहेस त्याअर्थी त्या तुझ्या शिराचं अस्तित्व क्षणभंगुर झालचं आहे असं समज.
बिभीषण--सत्यासाठीं तुझ्या दरबारांत माझं शीर सुळावर लटकलं गेलं तरी मला त्यांत भूषणच वाटेल. मदांध राजा, तुला स्वतः च्या पराक्रमाची फार घमेंड आहे. सत्याचा पाठीराखा ईश्वर आहे हें उदात्त तत्त्व-दुर्मदा! तुला कसं दिसत नाही? क्षुल्लक कीटकाच्याही हक्काचं संरक्षण एका सर्व समर्थ जगन्नियंत्या प्रभूकडून केलं जातं. रावण कोणी एखाचा वीरानं ही तुझी लकानगरी जिंकून घेतली आणि त्यान शौर्याच्या जोरावर तुझा राणीवसा बलात्कारान भ्रष्ट केला-
रावण--चुप रहा. राजनीतीच्या आणि पराक्रमाच्या व्याख्या असल्या पाचकळ भाषेंत आम्हीं कधीही ऐकणार नाहीं.
दरवारस्थ--आमचेंही असेच मत आहे.
बिभीषण--उन्मत्ता! तू तोंडाचा श्वान असून मनाचा हरिणाप्रमाणं भित्रा आहेस हें भी पूर्ण ओळखतों. राजाची हाजी हाजी करून आपल्या पोटाची वीतभर खळगी भरण्याच्या स्वार्थी कामांत पटाईत असलेल्या या तुझ्या तोंडपुज्या मसलतगारांच्या खुषामतीवर तूं आपल्या पराक्रमाची बळकटी आहे असं समजत असशील तर तो तुझा समज चुकीचा आहे. रावणा, एवढा मोठा बलाढ्य व पराक्रमी हिरण्यकश्यपू दैत्य. ज्याला प्रत्यक्ष विरूपाक्षाचा वर होता. आणि ज्या सूज्ञ दैत्यानं स्वत:ला अमर करवून घेण्यासाठी शंकरापाशीं एक बाणेदार व अटींचा वर मागून घेतला. त्याच दैत्याच्या पापाची रास आकंठ भरतांच, परमेश्वरानं नरसिंह अवतार धारण करून, प्रल्हाद पोराच्या भक्तीसाठी सभामंडपाच्या खांबाला काडकन् दुभंग करून, शंकराच्या वराला कलंक न लावता, त्या हिरण्यकश्यपूची पापपूर्ण आंतडी कांतडी कशी लोळवली याचा कांहीं विचार कर. अधर्मान आणि अनीतीनं वर्तन करणान्यांना नेहमीं अशीच दुर्गती मिळणार.
रावण--बिभीषणा, त्या मूर्ख हिरण्याकश्यपूची अक्कल आणि या रावणाची योग्यता तूं एक समजतोस की काय? ज्या षंढाला शंकरापासून अमर होण्याचा वर नीटपणे मागून घेता आला नाहीं, त्याच्या बाणेदारपणाबद्दल-मूर्खा-कशाला माझ्यापुढे थोरवी गातोस? एक इच्छामरणाचा आशिर्वाद मागितला असता तर अवेळी अवतार घेण्याची त्या नरसिंहाची काय छाती होती? परंतु बिभीषणा. लक्षांत ठेव, या त्रैलोक्याचा अधिपती मी आहे ; शस्त्रास्त्रांत प्राविण्य पटकविणाऱ्या शूर धनुर्धरांचा नायक मी आहे आणि या भूगोलावरील चलाचल स्थावर जंगमावर हुकमत चालविणारा राजाधिराज मीच आहे. सीता हरण करण्याला मला कोण प्रतिबंध करू शकतो?
बिभीषण--कोण प्रतिबंध करणार? दुर्मदा! तेहतीस कोटी देवान तूं बंदीत ठेवलं आहेस म्हणून अंतकाळीं तुझा सूड घ्यायला एक विश्वशक्ती या तुझ्या लंकाद्वीपाच्या सभोंवार मोठ्या आतुरतेने फिरत आहे हें पक्क ध्यानात ठेव. राजा, तुझ्या अधर्माची व पातकांची रास दिवसेदिवस चढत्या कळेवर आहे याचा कांहीं विचार कर. नाहीतर या हांजीहांजीखोर लुब्या मंत्र्याच्या खुषामतीला तू बळी पडल्याशिवाय खास राहणार नाहीस.
इंद्रजीत---विरोधी घरभेद्या नरपशो? आम्हाला ज्यांत सौख्य आहेसं वाटतं तें तें आम्हीं केल्याशिवाय खास राहणार नाहीं. या आमच्या इच्छेला अगणित बळी पडले तर पडोत; परंतु आमच्या मानसिक महत्त्वाकांक्षा आंवरून धरण्याची आमची खुषी होणार नाहीं.
रावण--या लंकानाथाच्या ऐश्वर्याचें तेज पाहून सूर्य खालीं मान घालून माझा दास झाला आहे. देवदिदेवांना नोकरासारखें राबवून नवग्रहांच्या उरावर पलंग ठेऊन त्यावर निद्रा करणारा मी रावण बलवान आहें. त्या विघ्नसंतोषी माकडांच्या वतीनं शुष्कवाद करणान्या तुझ्यासारख्या घरभेद्या वकिलाच्या वितंडवादाला आम्ही कस्पाटाप्रमाणें लेखतों.
बिभीषण---राज, तुझ्या साऱ्या गर्वोंक्तीचं पाणी होऊन तूं सातळाला जाणार, हें तुझ्या भालप्रदेशी लिहिलेल मला स्पष्ट दिसत आहे.
रावण--बिभीषणा, ज्या या रावणानं एवढे चौदा चौकड्याचं राज्य कमावलं तें विचार करूनच कमावलं आहे. या रावणाच्या हातात चाप आला नाहीं तोंर्यंत वाटेल त्यांनीं आपल्या धनुर्शक्तीची थोरवी गात रहावी मरसमरांगणांत माझ्या सर्व सैन्याचा जरी चुराडा झाला. तरी अखेरीस हा एकटा रावण सर्वांनां पूर्ण अजिंक्य आहे हैं तुम्हा सर्वांच्या दृष्टोत्पत्तीस आल्यावांचून राहणार नाही.
बिभीषण--रावणा, तुझं वैभव अबाधित रहावं, अशी माझी मनापासून इच्छा आहे व याबद्दल मला जितका आनंद व अभिमान वाटेल तितका दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपासून वाटणार नाही. परंतु शहाणा असशील तर तो रामवीर सागर तरून इकडं आला नाहीं, तोंच त्याची स्त्री त्याला परत नेऊन देऊन तुझा आणि तुझ्या लंकाद्वीपाचा बचाव कर. इंद्रजीता कृतघ्ना, तू आपल्या दृष्ट मतीनं या रावणाला पूर्ण घेरलं आहेस. पण तूंही ध्यानात धर-पूर्ण लक्षात ठेव की चोरांनीं कपट केलं म्हणून त्याचे वाडे कधीहिं वसत नसतात.
रावण--अरे जा. त्या मानवी रामाची प्रतिष्ठा ती काय? तुझ्या या दर्पोक्तीची भीती बाळगून त्या सीता सुंदरीला त्या नीच रामाकडे परत पाठविण्याइतकी या बलाढ्य रावणाची शक्ती क्षीण झाली नाही. सीतेच्या प्रफुल्ल सौंदर्यपुष्पाचा आम्ही पूर्ण स्वाद घेणार. तिच्या यौवनोपवनांत आम्ही स्वच्छंद विहार करणार. कालांतरानं त्या सीतासुंदरीचा यौवनभर पूर्ण नाहीसा होऊन ती माझ्या शिथिल आलिंगनापूसून मुक्त झाल्यावर, माझी महत्वाकांक्षा पूर्णतेस पोहचली म्हणून जो महोत्सव साजरा करण्यांत येईल. त्यावेळी कृपादृष्टी म्हणून तिची मुक्तता झाली तर होईल. या गोष्टीसाठी हे भव्य आकाश जरी मजवर कोसळून पडलं, तरी या माझ्या बाहुबलात इसकी प्रचंड शक्ती भरली आहे, की एका हातान त्या आकाशाला झेलून घरून दुसऱ्या हाताच्या मुष्टीनं रामाचं शीर शतचूर्ण करीन ; आणि नंतर अनंत काळपर्यंत जानकीच्या समागमाचें सौख्य हा लंकापती भोगणार, हे सर्वांनी पूर्ण ध्यानात ठेवावं.
बिभीषण--आणि दुष्टानों, हेंहिं लक्षात ठेवा की, आपल्या प्रखर तेजानं नभोमंडळाच्या मध्यभागी चमकत असलेल्या ज्या सूर्यनारायणानं या बिभीषणाचा भरदरबारात अपमान झालेला आज पाहिला, त्याच आरक्त मास्कराला हें लंकेचें संपूर्ण राज्य केवळ अनीतीच्या व अधर्माच्या प्रवृत्तीनें लयाला गेलेलं पहाण्याचा प्रसंग खास येणार.
(निघून जातो )
भाट-- दरबार बरखास्त
अंक तिसरा समाप्त
अंक चवथा
प्रवेश १ ला
(अंगद प्रवेश करतो.)
अंगद०--
पद०(मन परदेशी०)
कैवल्यदानीं रामीं रमो । मन ॥ धृ० ॥
मृगजलवत इहलोकिं भास ती आस सुखाची
कां धरितां ॥ सर्व सौख्य परमेशपदीं त्या
विस्मरणीं जन हा न भ्रमो ॥ १ ॥ सर्व मुक्तिचा
आगर सागर करुणेचा श्रीराम गमे ॥ रामचिंतनीं
भवभय चिंता पार हरे तच्चरणिं रमो ॥ ३ ॥
(रामेश्वराचा समुद्र किनारा, राम, लक्ष्मण, मारुती, जांबुवंत, सुग्रीव आणि वानरसैनिक बसले आहेत.)
अंगद०--जय जय रघुवीर समर्थ.
राम०-- अंगदा ये बैस.
अंगद०--महाराज, त्या रावणाकडून कोणी एक राक्षस राजपुत्र आपल्या चार प्रधानांसह आला आहे. तो ह्मणतो मी रावणाचा बंधू बिभीषण असून सीतावल्लभाला शरण आलों आहे. हें त्याचं विनंतीपत्र. (पत्र देतो.)
जांबुवंत०--हे कार्यसाधू राक्षस पत्र पाठवितील. वेषांतरं करतील. सर्व कांहीं करतील. वेळ पडली तर एकाद्याच्या पायांवर गडबडां लोळण घेतील. पण यांचा कावा फार निराळा असतो. अंगदा, त्या राजपुत्राला जाऊन साफ सांग कीं आह्मीं तुझ्या या पत्राच्या भपक्याला भुलून हुरळे होणारें नव्हे. अरे पोरांनो, या बेट्याचा कावा तुह्यीं नाहीं ओळखलात?
अंगद०--तो कोणता आजोबा?
जांबुवंत०--कोणता? अरे बाबा तो फार निराळा आहे. रामचंद्रानं, त्या वालीला मारून या सुग्रीवाला त्याच्या जागीं स्थापन केलं आणि वालीची पत्नी पतिव्रता तारा याला दिली. हें कर्णोपककर्णीं ऐकून है प्रजापती लंकेहून येथे आले आहेत. येऊन भेटून सांगायचं काय? तर माझ्या वडील बंधूला ठार मारा आणि त्याच्या राज्यासनाबरोबर त्याची बायकोहि मला वापरायला द्या. उठले आपले सोळभोक कीं आले दर्शनाला, मी तर स्पष्ट असंच म्हणतो की लंकाबेटांतील या बेट्या कार्यसाधू राक्षसांना आपल्या या भूमीवर पाऊल सुद्धा ठेऊं देऊं नयें.
अंगद०--मलासुद्धां असंच वाटतं. कारण असं पहा, आपत्कालीं प्रत्यक्ष वडील बंधूचा धाकल्या बंधूनीं त्याग करून उलट त्याच्या शत्रूलाच शरण यावं, यांतच काहीं विशेष आहे. तशांत या लंकेंतल्या राक्षसांवर विश्वास ठेवायला आतां तिळमात्रही जागा नाहीं.
राम०--तें सारं खरं अंगदा. पण अशा वेळीं कोणत्या धोरणाचा स्वीकार करावा हेंच मला समजत नाहीं, कारण-
पद. (प्रभो अनाथ ० )
भ्रमें मदीय मानसा विवेक त्यागितो कसा ॥ धृ० ॥
दर्शनोत्सुका जनांस। नच देतां दर्शनास ॥
ब्रीद जाइ तें लया कलंक ये कुला असा ॥ १ ॥
दैव साध्य ज्यास नसे । प्रतिकुल त्या विश्व असे ॥
सुफल कार्य विफलसे यशास विमुख तो जसा ॥ २ ॥
अंगद०--परंतु रामचंद्रा, सांप्रतचा प्रसंग बसल्या बैठकीवर नैतिक तत्त्वांची चर्चा करण्याचा नसून, आपण सर्व युद्धाला तोंड देण्यासाठी निघालों आहोंत. अशा वेळी या शत्रूच्या राजपुत्रांशीं गांठ घेतांना श्रीरामानीं विशेष खबरदारी घ्यावी.
जांबुवंत०--त्याची गांठच घ्यायची असेल तर त्या कामी अस्मादिकांची योजना व्हावी. अगदीं अश्शी जखडून बांधतो की हूं:!
लक्ष्मण०--मला वाटतं की या कामीं हनुमंताचा सल्ला विशेष ग्राह्य होईल. कारण लंकेंतली पूर्ण माहिती जर कोणाला असेल तर—
जांबुवंत०--तर ती या बेट्या मारुतीलाच आहे. कायरे मारुती. हा कोणरे घरभेद्या?
मारुती०-- तुमचे सगळ्यांचे तर्कवितर्क संपले ना?
जांबुवंत०--तर्क वितकांचा एक कणहि शिल्लक नाहीं.
मारुती०--श्रीरामा, मी सर्व लंकानगरींत प्रळय करीत असतांना—
पद. (तो तननन वाजवि०)
श्रीहरिहरपदिं नित नत जो ॥
श्री विष्णुभक्त सात्त्विक जो ॥
हा बिभिषण नरवर । जोडुनि द्वय कर ।
शरणांगत तुज । त्यागुं नये त्या ।
विमल प्रभूश्री गाजो ॥ १ ॥
राम०-- असं आहे ना? ठीक, काहीं हरकत नाहीं. अंगदा, बिभीषणाला योग्य
आदरसत्कारानं घेऊन ये. जा? (अंगद जातो)
जांबुवंत०--त्याला आदरसत्काराची व्याख्या नीट समजावून सांगा हों. नाहीतर बिभीषणाला स्वागताच्या ऐवजी मुष्टिमोदकांचा फराळ यथेच्छ लाभायचा. बाकी तो मोठा हुशार आहे बेटा.
[बिभीषण व अंगद प्रवेश क०]
अंगद०--हे आमचे श्रीरामचंद्र.
बिभीषण०--[साष्टांग नमस्कार घालून] श्रीरामचंद्रा तुझा जयजयकार असो.
राम०--[त्यास उठवून] बिभीषणा, सांप्रत आंह्मी कोणत्या कृत्यांचे डावपेच लढवीत आहोंत, हैं जर तुह्याला कळेल तर अशा स्थितींत आह्मी तुमची-प्रत्यक्ष शत्रूच्या बंधूची भेट घेणं फार धोक्याचं आहे. तथापि तुमची माझ्या ठिकाणीं असलेली दृढनिष्ठा न्त्याबद्दल या आमच्याविश्वासू मारुतीनं दिलेली हमी पाहूनच मी फार संतोषानं तुमची भेट घेतली.
बिभीषण०--श्रीरामा. भगवद्भक्त मारुतीचं दर्शन मला लंकेंतच झालेलं आहे. परंतु आता—
पद (भला जन्म हा० )
सुरतरुसम हें दर्शन लाभे पुनित तुझें तें मला ।
मोक्ष हा इहजन्मीं लाभला ॥
लोहसम हा देह स्पर्शितां परिसासम पाऊलां ॥
स्वर्णता स्वयेंचि तो पावला ॥
॥ चाल ॥ मग काय उणे तें भक्तजनांना जनीं ॥
तव मूर्ति वंद्य ही विहरत नित मन्मनीं ॥
भव ताप पाप तें विलया गेले झणीं ॥
असो शिरीं या नत भक्ताच्या प्रसादकर हा भला ॥
मोक्ष हा० ॥ १ ॥
--सत्याच्या सिद्धतेकरितां आणि धर्मराज्याच्या स्थापनेकरितां मी त्या उन्मत्त व अविचारी रावणाचा पक्ष सोडून तुला शरण आलों आहें. [पायां पडतो.]
राम०-- [त्यास उठवून] विभीषणा उठ.--
पद. (घरजाने दे०) कानडा,
तुज गणुनि बांधवासम मी । शरणांगत तुज मरण द्यावया
कुमति न उपजे रामीं ॥ धृ० ॥ हनुमंतास चिरायु होई ।
नृपती- वैभव-सौख्यहि घेई ॥ कृपाकटाक्षें या मम जोंवरि
रविशशि अंबरधामीं ॥ १ ॥
--आंता रावणासंबंधी म्हणाल तर पुढें ओढवणारी सर्व भावी संकटं तो आतांहि टाळूं शकेल. परंतु ज्याच्या उन्मत्तपणाची व अधर्माची पायरी आतां कळसाला जाऊन भिडली आहे, त्याला उपदेश करण्याचें धाडस कोणीहि करूं नये. वास्तवीक पहातां लंकाद्वीप आणि आर्यावर्त यांत वैरभाव येण्याचं कांहींच कारण नव्हतं.
जांबुवंत०--हो कांहींच कारण नव्हतं. लंकाबेबेटांतले लोक लंकेंत यथेच्छ भोजन करीत होते आणि आर्यावर्तांतहि मेजवान्यांना कांहीं खंड नव्हता. पण तें व्हावं कसं?
लक्ष्मण०--तसंच रावणमहाराज आपल्या जगविख्यात पुष्पक विमानाच्या द्वारें सर्व भूगोलावर संचार करीत होते. त्याचप्रमाणं आर्यावर्तालाहि त्यांची स्वारी अनेक वेळा होत असे. सीताहरणाचा अक्षम्य गुन्हा न करितां--
जांबुवंत०--आणि तोहि भिक्षांदेहीच्या कावेबाजपणाने.
लक्ष्मण०--हो न करता आर्यावतांत त्यांनी आपला संचारक्रम अव्याहत सुरू ठेवला असतां, तर त्यास कोणीहि प्रतिबंध केला नसता. आता सीतामुक्तीच्य भावी युद्धानंतर कोणताहि रावणवंशज या रामेश्वराची मर्यादा उल्लंघूं म्हणेल तर तें कदापि होणं नाहीं.
बिभीषण०--त्याच्या नशिबात असेल तसं होईल. आतां सागरोल्लंघन करून सर्व सैनिक लंकेंत पोहचविण्याकरितां समुद्राची प्रार्थना करून मार्ग मागावा.
राम०--ठीक आहे. लक्ष्मणा, येथें दर्भासन तयार कर पाहूं?
लक्ष्मण०--आज्ञा. [तसें करतो.]
राम०-- [त्यावर उभे राहून]
पद. (श्रीरामीं मना०)
दे सगरसुता मज मार्ग अतां ॥ धृ ॥
सत्य सुधर्मा स्थापन करण्या ।
सिद्ध असे मज तारक तूं मज पालक तूं ।
यश देई अतां ॥ १ ॥
जनकसुता ती बंधनिं पडली ।
मानवते नच दुष्ट कृती सुजनांस कधीं ।
तिज मी हरितां ॥ २ ॥
(ध्यानस्थ बसतो. इतक्यांत शुकराक्षस प्रवेश करितो)
शुक०--अहो, येथें कोणी सुग्रीव नांवाचा सेनापती आहे का?
जांबुवंत०--कांहो? अहो कोळशांतले माणिकराज? त्यांच्याशीं आपलं काय काम आहे? हा बेटा लंकेंतल्या राक्षसांपैकी दिसतो एक सीता पळवून नेऊन आम्हांला नसत्या उपद्वयापांत पाडलयं, आतां आणखीं एखादी सीता पळवून नेण्याचा याचा विचार आहे कीं काय? आपापल्या सीता संभाळा रे बाबानों! बाकी सध्यां म्हणा आपण सडेसोटच आहोंत. अरे ए सुग्रीवा, हा तुला कोण भेटायला आलाय पहा. दुरूनच भेट हो.
शुक०--सुग्रीवा, तुला रावणाचा एक निरोप आहे.
सुग्रीव०--कोणाचा? रावणाचा? तो रे कां बाबा? रावणाचा माझा काय संबंध?
शुक०--वा: असं कसं ह्मणतां! रावण तर तुला प्रत्यक्ष बंधू समजतो.
जांबुवंत०--केव्हापासून रे! विभीषण इकडं आल्यापासून कीं काय?
शुक०--छे: छे: त्याच्या आधींपासून. रावणानं आग्रहानं तुला सांगितलंय कीं तुझं हें अगणित सैन्य घेऊन तूं या रिकामटेंकड्या रामाच्या नादीं कशाला लागलास? आम्ही जानकी पळवून आणली ती कांहीं तुझी बायको नाहीं. मग त्या भानगडींत तुला पडण्याचं काही कारण नाहीं.
सर्व सैनिक०--संधीविग्रह? संधीविग्रह!!
मारुती०--या संधीविग्रहाला आतांच जमीनदोस्त केला पाहिजे. संधिविग्रहाचं विष फार भयंकर असतें. सुग्रीवा, तूं हो बाजूला मी देतों याला याचं उत्तर, अहो दूत, लंकेंतले तडाखे विसरलात वाटतं? प्रसाद देऊं का?
शुक०-- कां? फारशी घमेंड चढली आहे? त्या रावणाचा तडाखा विसरलास वाटतं? गोड गोड बोलावं तर तुम्हांला कडू लागतं नाहीं कां?
जांबुवंत०--तोंडाची व जिभेची रुचीच बदलली आहे. ती रुची रावणाचा वध होऊन सीतामुक्तीच्या मेजवानीत पुन्हां ताळ्यावर येईल. एरवी नाहीं.
शुक०--अरे गए बैस थेरड्या. रावण राहिला लांब, पण त्याचा दूत हा शुकराक्षस स्वतः तुमच्या—
सुग्रीव०--[त्याचें नरडें पकडून] स्वतः तुमच्या उरावर बसून-[ ठोसा मारून ठार करून प्रेत दूर फेंकतांना] जा आपल्या बापाच्या घरीं.
सर्व सैनिक०--जय जय रघुवीर समर्थ.
राम०--[समाधी उतरून] काय? हा समुद्र अझूनही मार्ग देत नाहीं?
जांबुवंत०--प्रसाद पाहिजे असेल.
राम०--आतां तीच योजना—
पद. (चमकताची भासते)
सगरजा! तब थोर पितरां जाणुनी मी मन्मनीं ॥
विनविलें बहु आदरें अवमानिशी धिःकारुनी ॥
परारि आतां गरलसम तव क्रुद्ध जल सर्पाकृती ॥
गरुड-बाणा साहि आतां नीच जलधे! दुर्मती ॥
जाणसी नच तूं मदांधा! कोण तुजला प्रार्थतो ॥
श्रेष्ठ रघुकुलवीर राघव नष्ट करि तुज या क्षणीं ॥ १ ॥
- [धनुष्यावर बाण लावून] हा बाणरूपी वडवानळ तुला हां हां ह्मणता शोषून टाकील. नाहींतर हा चाप अगस्ती तुला एका आचमनानेंच गट्ट करील. बोल? कोणता मार्ग स्वीकारतोस? तूं इतका क्षुब्ध होऊन या रघुवीराला जो त्रास देऊं पहात आहेस, तेंव्हा तुझ्या उन्मत्तपणाला योग्य तेंच शासन मी करितों उन्मत्तपणाची नुसती छाया दिसतांच तिची ताबडतोब नांकठेंची केली पाहिजे.
[समुद्र स्त्रियांसह उत्पन्न होतो.]
समुद्र व स्त्रिया०-पद ( साग साग सागम मगरिसा०)
शांती शांती शांती झणिं वरि । शांती शांती शांती ह्रदिं
धरि ॥ शांतवि हृदया या समया । नत तव पदिं हा
राया ॥ धृ ॥ होतो उसळत स्वाभाविक मम धर्मापरि
करि नच क्रोधा ॥ अपमानें नच निंदियलें ॥ शरणा नच
दे मरणा या ॥ १ ॥
राम०--सागरा तुला क्षमा आहे. परंतु धनुष्यावर चढलेल्या बाणाची काय व्यवस्था करू?
लक्ष्मण०--तो कधींहि परत घेतां यावयाचा नाही.
समुद्र०--राघवा—
ओवी
पश्चिम दिशेला मरु नामें दैत्य ।
जो माझ्यांतील जलचरें भक्षित ॥
गोब्राह्मणा नित्य छळित ॥
त्यावरि सोडीं रामबाणा ॥ १ ॥
राम०--दुष्टाचे पारिपत्य आधी केलंच पाहिजे [बाण सोडतो.]
समुद्र०--राघवा, भी तुझें जामातासमान पूजन करितो या रत्नालंकारांचा व वस्त्रांचा स्वीकार करून या वनवासी वत्कलांचा त्याग करावा.
सर्वजण०--सागरा तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत.
समुद्र०-- आतां असं करा—
साकी
सेतु बांधुनी नळकपिकरिं तो सुखरुप लंका पावा ।
देवदानवा दास्यमुक्त ते करुनि सत्यजय दावा ॥
सीतादर्शन तें ॥ होवो झणिं मज पावन तें ॥
सर्व०--- तथास्तु--तथास्तु.
प्रवेश २ रा
स्थळ: लंकेंतील रस्ता
पात्रें : रावण, अरण्यपंडित
रावण०-- (प्र० क०) माझा वैरी अयोध्येचा वनवासी राजपुत्र आपली निःशस्त्र सेना घेऊन माझा पराभव करण्याच्या कोया पोकळ इर्षेनं इथे येऊन दाखल झाला. काल सायंकाळी चंद्रोदयाची लीला पहात मी माझ्या राजमंदिराच्या सज्जावर बसलों असतां, त्या नीच लक्ष्मण कारट्यानं, बाण मारून माझ्या मस्तकावरचा मुकुट खालीं पाडला. परंतु त्याला हें काय माहीत—
पद (आजवरी जनक०)
स्पर्शसुखा तळमळती कितिक किरिट ते ।।
रत्नजडित लभ्य न जे शचिपतीस ते ॥ धृ० ॥
विश्वपती नृपतिपदीं दासि इंदिरा ॥
नादिनान्त वैभव नच ज्ञात पामरा ||
ईशकृपापात्र असति श्रेष्ठ नृपत्ति ते ॥ १ ॥
(अरण्यपंडित प्र. क.)
-कायरे अरण्यपंडीता, काय बातमी आणलीस?
अरण्यपंडीत०--महाराज, आणखी खबर ती काय असायची? राम आपली प्रचंड सेना घेऊन या लंकाद्वीपांत येऊन दाखल झाला.
रावण०-- अॅ:! ही बातमी अगदीं शिळी सांगितलीस.
अ० पं०--वाटेल तर ताजी सांगतो. महाराजानां माहीत आहेच कीं माझी ज्या ज्या कामांवर आजपर्यंत नेमणूक होत गेली तीं तीं सर्व कामे मी अगदीं चोख करीत आलो आहे. त्याबद्दल मिळालेली सर्व प्रशंसापत्रें दरबारात हजर करण्यासाठीं दहा हत्ती जोडलेल्या एका भल्या मोठ्या रथांत घालून आणणार आहे. आतां आपल्या नगरींतील शांततेसंबंधी म्हणाल तर तीहि अगदीं गारीगार आहे. ही रामसेना इथं आल्यापासून आपले पांच पंचवीस राजवाडे-कांही फार नाहींत, अगदींच थोडे जमीनदोस्त झाले. हजार दोन हजार राक्षससैन्य कांडूनकुटून फस्त झालं आणि ठिकठिकाणीं आग लागणं, लुटालूट होणं वगैरे क्षुल्लक प्रकार माझ्या पाहण्यांत आले. बाकी जिकडं तिकडं शांतता आहे. महाराजांनी त्याची काळजीच करूं नये. सर्व लंकेत सर्व रहिवाशी अगदी शांत आहेत.
रावण०--(स्व०) एकूण गोष्ट इतक्या थराला येऊन भिडली आं? ठीक आहे काही हरकत नाही. या सर्व प्रकारनं माझ्या दुराग्रहाच्या आगींत आता जास्तच तेल ओतलं आहे. पाहूं आता त्याच्या ज्वालांपुढे त्या मानवी रामाचा काय टिकाव लागतो सो? अरण्यपंडिता? (उ०) तो घरभेद्या बिभीषण रामाच्या पक्षाला जाऊन मिळाला हें खरंच का?
अ० पं०-- सूर्याच्या तेजाबद्दल आणि कोळशाच्या काळेपणाबद्दल जितकी सत्यता आहे, तितकीच या गोष्टीबद्दल आहे. महाराज, एक चार शब्द बोलतों याची माफी आपल्याकडून असेलच?
रावण०-- बोल काय बोलतोस ते?
अ० पं०- महाराज मी आजपर्यंत खवळलेले समुद्रही पाहिलेत आणि खवळलेल्या खुनशी बायकाही पाहिल्यात, पण समुद्राच्या तुफानांत सापडलेल्या नावाड्यापेक्षां खुनशी स्त्रियांच्या प्रेमीजनांची मला भारी कींव येते बोलूनचालून या बायका म्हणजे मूर्तिमंत पडछाया. यांना धरायला गेलं कीं त्या पळाल्याच. त्यांची मनधरणी करा की फुगल्याच त्या आणि त्यांच्याकडे कोणी ढुंकून पाहिलं नाही की त्या पुरुषांच्या मागं लागल्याच समजा गोंडा घोळवायला. त्यांतल्यात्यांत दोन बायका-एकीपेक्षां एक वरचढ-एका ठिकाणी असल्या की तेवढ्या जागेतील हवा गोठून तिचं बर्फ व्हायचंच.
रावण०-- परंतु आज आपलं हे अरण्यपांडित्य चाललं आहे कशावर?
अ० पं०--असल्या त्या सीतेसाठीं रावणमहाराज इतके उल्लू झाले असतील असं मला स्वप्नांतसुद्धां दिसलं नाही. पण आज तें प्रत्यक्ष पहाण्याचा योग आला.
रावण०-- अरण्यपंडिता, आम्ही सत्ताधीश राजे असल्या बाष्कळ कविकल्पनांवर वाजवीपेक्षा फाजील विश्वास ठेवून आमच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या कामात कधींही माघार घेत नसतों. या त्रैलोक्यांत जितक्या गोष्टी अशक्य भासतात तितक्या शक्य आहेत, हें सिद्ध करून दाखविण्यासाठींच या रावणाचा अवतार आहे, हें पूर्ण ध्यानांत ठेव. आमचीलहर लागल्यास--
पद (रामकरी जरि०)
जंगमवस्तू स्थावरतेला ॥ पर्वत त्यागिल तो जडतेला ॥
स्थूलत्वचि तें जनिं जलनिंधिला ॥ तात्काळचि येई ॥१॥
सोडुनि प्रखरहि दाहकता ती ॥ अग्नी सेविल बलाढ्य नृपती ॥
अशक्य शक्यचि क्षणांत घडती ॥ नृपइच्छामात्रें ॥२॥
- अरण्यपंडीता, मी तुझ्या कविकल्पनांचा निषेध करतो.
अरण्यपंडीत०--महाराज मी पूर्वी कवि होतो.
रावण०--पण आता तर नाहीस ना?
अरण्यपंडीत०--छे:! मुळीच नाही. तो नाद मी केंव्हाच सोडून दिला आहे. पूर्वी मला हा नाद भारी होता. एकदा असं झालं-एका बाईच्या दंतपंक्तीवर कविता करण्यासाठीं आमची कविराजांची स्वारी कल्पनेचे पंख उभारून या दातांवरून त्या दातांतावर वर्णन करीत उडवा मारीत चालली होती. इतक्यात काय झाले, त्या बाईचे मधलेच दोन तीन दात पडले होते, आमची कविराजांची स्वारी वर्णनाच्या आनंदात व आवेशांत बेहोष होऊन जों उड्या मारीत चालली आहे, तो स्वारीची उडी पडली धाडकन् त्या दातांच्या खिंडीत! जेमतेम मी आपल्या पोक्तपणाच्या पुण्याईनं कसाबसा वर आलों. तीच घेतली कवित्वाची शपथ.
रावण०--पुरे कर तुझं हे अरण्यरुदन. सीतेची मनधरणी करण्याकरितां मी अशोकवनात जात आहे. तू पहाऱ्यावरच्या सर्व राक्षसांना वर्दी दे-नाहीं सक्त हुकूम फर्माव कीं मी परत येईपर्यंत कोणालाही कोणत्याही निमित्तानं आंत सोडतां कामां नये.
अरण्यपंडीत०--ठीक आहे. मी आतां तिकडंच जातों. (जातो.)
रावण०-- एक काम तर पार पडलं. विद्युज्जिह्व राक्षसाच्या मताप्रमाणं रामाचं कृत्रिम शीर हुबेहूब तयार करून सीतेला दाखवितांच, ती रामाविषयीं अगदीं निराश होऊन माझ्या प्रखर कामाग्नीची शांती करायला खात्रीनं सिद्ध होईल. अहाहा! त्या सीतेचं नुसतं स्मरण होतांच तिची ती रम्य मूर्ती या डोळ्यांसमोर स्पष्ट दिसू लागते. काय तिचें तें सौंदर्य? वास्तविक पहाता –
दिंडी.
मूर्ति सुंदर आनंद सतत देते ॥
सौख्य-तरु मंडपिं शांत झोंप देते ॥
मधुर स्वप्नाची मधुर सुवासाचीं ॥
प्राप्त निद्रा ज्या धन्य धन्य तोची ॥१॥
- पण नाही, सीतेला निर्माण करून विधीनं आपल्या सर्वोकृष्ट करामतीचा कळस केला असंच म्हटले पाहिजे. असो, याच विचारांत येथें राहता कामा नये. त्या विचारांची आराध्यदेवता जी सीता तिला प्रथम वश केलीच पाहिजे.
(जातो.)
प्रवेश ३ रा
स्थळ : अशोकवन
पात्रें : सीता
सीता०-- हा माझा बंदीवास कधीं संपतो कोण जाणे! –
पद (होय संसार०)
रामहृदयाब्जमधुस्वादलोलुप भ्रमरि ॥
वन्य ते क्रूरजन छळिति तिज बहुपरी ॥धृ॥
वक्षसुखसंधि पति । देत जैं सतिप्रती ॥
कंठहारास पति सहन नच समयिं करि ॥१॥
त्याच रघुनंदना | जलधि गिरि कानना ।
भव्य विरहांतरा । सहत मनिं विपिनिं तरि ॥२॥
(चपापून) अगबाई. हा नीच रावण इकडंच येत आहे की काय? होय तोच तो. मेल्या, अनाथ अबलेवर आपली नीच दृष्टी फेकशील, तर चांडाळा. पापाच्या मार्गात एक पाऊल टाकतोस न टाकतोस तोच माझ्या पतिव्रत्याच्या तेजानं जळून खाक होशील. (निराश होऊन) सर्वसाक्षी परमेश्वरा, पवित्र इच्छेनं निर्माण केलेल्या भूतलावर सांप्रत सुरू असलेला अधर्म व अनीती तुला पहावतात तरि कशी? या बंदिवासात माझी स्थिती पुढे काय होणार कोण जाणे! सध्या तर—
ठुंबरी.
प्रियाविण नाहीं मानसीं चैन । जीवनि या नच त्राण ॥धृ॥
स्मरण घडे जधिं हृदयचि पोळे ।
विरहिं न तनुचें भान ॥१॥
भानुविना शशि तेज न पाये।
शशिसम त्या मी म्लान ॥२॥
--अगबाई, तो आलाच. आतां मी जाऊं तरी कुठं? आणि आश्रय तरी कोणाचा धरू? ती त्रिजटाहि अझून आली नाही. (इकडे तिकडे लपूं लागते.)
(रायण प्र०क्र०)
रावण०-- (स्व.) हीच ती माझी आराध्यदेवता सीता. ही शोकानं इतकी ग्रस्तं झाली असतांही हीचं सौंदर्य शुक्लेंदुप्रमाणं वाढत्या प्रमाणावरच आहे. अशी प्रियतमा माझ्यावर प्रसन्न झाल्यास—
पद. (मुला सांग०)
स्वर्गसुख दूर तें फार नोहे ।।
मंदन जें रतिनिकटिं घेउं पाहे ॥धृ॥
मस्तकीं मालती सुमनगुच्छा धरी ॥
चंदनाची उटी तनुसि लावी ॥
प्रणयपूर्णा अशी युवति वक्षस्थळीं ॥
घेई जो त्यास ते प्राप्त आहे ॥१॥
--प्रिये (उ०) मनहरणी सीते! काय तुझा हा दुराग्रह? तूं होऊन आपल्या सुवर्णकेतकीसारख्या कोमल देहाची दुर्दशा करून घेत आहेस. जानकी, तूं एकदा या रावणाला-या लंकापतीला तुझ्या-पतित्वाचा मान दिलास तर तुला कशाची कमतरता आहे? तेहतीस कोटी इंद्रादि देवदानय तूं रावणपत्नी त्रैलोक्यपट्टराणी म्हणून पायांशीं नम्र होऊन तोंडातून निघणाऱ्या शब्दांना झेलून तुझ्या धरण्यांसाठीं श्वानाप्रमाणं गडबडां लोळतील. फार काय, पण प्रत्यक्ष माझी पट्टराणी मंडोदरी तुझी थुंकी झेलणारी बटिक करून मी ठेवीन. सीते, तुला निर्वाणीची विनंती करण्यासाठींच मी या अशोकवनांत आज आलों आहे. नीट विचार करून काय तें उत्तर दे. तूं कशाचं चिंतन करीत आहेस?
सीता०--आणखीं कोणाचं करणार?
पद. (राजनके राज०)
चिंतनिं या नाथ रघुराज प्राणविसावा ।
तोचि राम । त्रिभुवनिं या तारक मज पावो ॥धृ॥
चरण तयाचें सतिला ते पावनसे ।
त्याविण सर्व पुरुष ते बंधू मज ॥१॥
-मी तुला सौम्य प्रकारानं पुन्हा हेंच सांगतें कीं या बाबतीत तूं माझ्यासमोर एक अक्षरसुद्धां उच्चारूं नकोस आणि हा तुझा दुराग्रह तुला सोडायचाच नसेल, तर रावणा, मी तुला आताच बजावून ठेवतें की माझ्या पातिव्रत्यभंगासाठी या सृष्टींतील पंचतत्वांनीं एकवटून आपल्या प्रखर सामर्थ्यानं माझ्या देहाची जरि राखरांगोळी केली तरी तशाहि स्थितींत या सीतेच्या देहभस्माचा एक कण देखील पातिव्रत्यभंगाची संमती देणार नाहीं.
रावण०-- ठीक आहे. या पराक्रमी बलाढ्य रावणाऱ्या दुराग्रहापुढें तुझा दुराग्रह कितपत टिकतो तें पहातों आता. पण सीते, तूं फक्क लक्षांत ठेव कीं ज्या बहाद्दरानं प्रत्यक्ष प्रलयाच्या क्रांतीलाहि न डगमगतां हें वैभवी थोर मस्तक कोणाच्याहि पुढं वाकविलं नाहीं; किंवा जो मी लंकाधीश निद्रासमयी देखील आजन्म कधीं निःशस्त्र निजलो नाहीं तोच मी रावण नि:शस्त्र होऊन कामेच्छातृप्तींसाठी विनंती करीत असतां तूं य:कश्चित् अबला त्याचा अपमान करतेस काय?
सीता०-- आम्ही स्त्रिया अबला म्हणून सत्यासत्याची पर्वा न करतां तुम्ही सबल पुरुष आमच्यावर सत्तेच्या बलानं बलात्कार करणार काय? पण मेल्या चांडाळा लक्षात ठेव. की आपल्या अत्याचारानं स्त्रियांच्या सहनशील मनाला त्रस्त करशील. तर निकराच्या प्रसंगीं आम्ही अबला स्त्रिया काळसर्पिणीपेक्षा उग्र स्वरूप धारण करून समुद्रमंथनाच्या जहरापेक्षां तीव्र क्रोधानं तुझ्या सारख्या सबल पुरुषांना एका क्षणांत जाळून खाक करूं.
रावण०-- या अशोकवनात क्रूर-राक्षसांच्या बंदीत-विशेषत: या रावण व्याधाच्या तडाक्यांतून तुला मुक्त करायला आणि तुझ्या पतिव्रत्याचें सत्च निष्कलंक राखायला कोणती विश्वशक्ती मला प्रतिबंध करते तें मला पाहू दें तुझ्या मुक्ततेसाठी जों जों तूं धडपडशील तों तों माझ्या दुराग्रहाच्या बंधनानं जास्तच संकटात पडशील. हें तूं पूर्ण ध्यानात ठेव. तें कांही नाहीं. तुझी संमती असो वा नसो. आज हा रावण दशदिग्भागातील सर्व देवतांच्या समक्ष आणि या अमर्याद विश्वविस्तारात अस्तित्व पावलेल्या दृश्यादृश्य सर्व ग्रहांना साक्षी ठेवून-या लंकानगरीच्या भर राजरस्त्यांतून तुला खेंचीत नेऊन बलात्कारानं माझ्या शयनशेजेला वश करणार; आणि अशा रितीनं माझ्या पराक्रमाची-
सीता०--मेल्या, कशाला सांगतोस आपल्या पराक्रमाची बढाई? माझ्या रामदूतानं तुझ्या कारट्याला उलथापालथा लोळवून. चांडाळा तुझ्याहि राजसभेचा विध्वंस केला. त्यावेळी मेल्या राक्षसा, तुझं हें काळं तोंड लपवून कुठं बसला होतास? निशाचरा, दशदिग्भागांतील देवतांना साक्ष ठेवून तूं माझ्यावर बलात्कार करणार काय? मेल्या, सत्तेच्या जोरावर अनाथ स्त्रियांच्या पातिव्रत्याला स्पर्श करशीलं, तर त्याच विश्वदेवतांच्या शापांनं-मेल्या-तुझी आहुती तूंच भडकावलेल्या अधर्माच्याप्रळयाग्नीत पडून जे अनाचारी मसलतगार आज तुझ्या लंकाराज्याची थोरवी गात आहे आणि तुझ्या उन्मत्तपणाची पाठ थोंपटीत आहेत. त्यांच्यासह तुला आणि तुझ्या लकांद्विपाला माझ्या रामसैनिकानी खेंटराखाली तुडवून रसातळाला जातांनां पाहीन तेव्हांच माझा आत्मा शांत होईल.
रावण०--सीते नीट विचार कर. तोंड संभाळून बोल. तूं कोणाच्या पुढं या वल्गना करीत आहेस? माझ्या लंकाद्वीपाला आणि माझ्या मसलतगारांना ते तुझं माकडसैन्य खेंटराखाली तुडविणार काय? उन्मत्त सीते, तुझ्या माकडांचा तो भावी पराक्रम पहाण्यापूर्वी या रावणाचा हा पराक्रम पहा. (भयंकर आवाज होऊन रामाचे कृत्रिम शीर अघांतरी लटकूं लागते.) तें पहा तुझ्या रामाचं शीर.
सीता०-- हाय हाय श्रीरामा--(मूर्छित पडते.)
रावण०--(स्व०) आता आपण जरा दूर जाऊन हिच्या पश्चातापाच्या न् निराशेच्या ज्वाळा कशा भडकतात ते पाहिलं पाहिजे. (जातो.)
सीता०--(मूर्छना सावरून) मी स्वप्न तर नाहींना पहात? छे: हे स्वप्न नव्हे? श्रीरामा, तुला याच स्थितीत पहाण्याकरिता का मी या बंदींत जिवंत राहिले? आणि याच रितीनं का माझी पुनर्भेट तू घेतलीस? प्रियकरा, या तुझ्या हास्यमुखाची व कपाळावरील कस्तुरीतिलकाची अखेरीस हीच स्थिती झाली ना? रामा, वनवासांत चौदा वर्ष तुमच्या कोमल पायांत कंटक रुतले आणि `सीते सीते` म्हणून वृक्षपाषाण कवटाळलेत ते याच अंताकरितां काय? ज्याच्या कीर्तीला आदि अंत नाहीं, अशा विख्यात सूर्यवंशाला कसा हा डाग लागला? मुद्रिके, तू हेच सांगण्याकरिता मला प्रथम भेटलीस का? –
पद (जाई परतोनी०)
विफल कसें होई । बाई । कवींद्र वाल्मिक
महामुनीचें भाष्यहि सारें विलया जाई ॥धृ॥
वानरसैनिक येथे येउनि । शिलापंथ तो
निधिवरि करुनी ॥ वधिल रावणा पापाचरणी ॥
राघव तो, या पवित्र वचनीं ॥ वाध कसा येई ||१||
--देवा! तू काय ही माझी विटंबना मांडली आहेस? रघुकुलवंशीय दशरथराजाची मी स्नुषा, प्रत्यक्ष ईश्वरावतार श्रीरामचंद्राची भार्या भी सीता असून तिचे हे सोहळे तू मांडले आहेस काय? रघुवीरा, या दावाग्नींतून मला आता कोण मुक्त करणार!
रावण०-- (प्र०क्र०) सीते, तुझ्या रामाला युद्धांत जिंकून तयाला खेंटराखाली जमिनदोस्त करणाऱ्या या पराक्रमी लंकाधीशाकडे पहा. आणि तुझा दुराग्रह सोडून या रावणाकडे प्रेमळ पट्टराणीच्या दृष्टीनं नजर फेंक.
सीता०--चांडाळा, माझ्या पतीच्या मृत्यूपेक्षा आणखी भयंकर कल्पांत जरी माझ्यावर कोपला तरी ही सीता आपल्या सदाचरणापासून एक तिळभरसुद्धा ढळणार नाही हे-नीचा-तूझ्या अझूनहि लक्षात येईल. मी अनाथ आहे असं समजून सत्तेच्या जोरावर माझ्या पवित्र देहाला पापबुद्धीनं स्पर्श करायला एक पाऊल पुढें टाक कीं ही रामपत्नी वीरांगनातुला याच-वेंळी नुसत्या क्रुद्ध डोळ्यांच्या उघडझापीनं जाळून फस्त करील, चांडाळा- राक्षसा-अधमा-
रावण०--चुप रहा. तुझी काय शक्ती असेल ती यावेळीं प्रज्वलीत कर. तुझ्या कुलदैवताचं स्मरण कर. तुझ्या सूर्यवंशाचं स्मरण कर. नाहीतर प्रत्यक्ष सृष्टी उत्पन्न करणाऱ्या ब्रह्मदेवाचं स्मरण कर. हा रावण तुझा पदर अस्सा खेंचून—
(सीतेच्या आगावर धावून जातो. सीता धीटपणानें उभीच राहते. इतक्यांत आकाशवाणी होते-`` मदान्ध रावणा विरंचीच्या शापाची स्मृती ठेव.")
रावण०--कोण? विरंची? विरंची माझा दास आहे.
(आकाशवाणी०-परस्त्रीला पापबुद्दीन स्पर्श करशील तर तुझा देह शतपूर्ण होईल,
या विरंचीच्या शापाची स्मृती ठेव.)
रावण०--( स्व०) अरे अरे अरे । दांत पडलेल्या सिंहाप्रमाणं माझी स्थिती झाली. (उ०) सीते, तुला आणखी विचार करण्यास फुरसुद देतो. तेवढ्या मुदतींत माझ्या रंगमहालात तूं स्वखुषीनं पाऊल ठेवलं नाहीस तर तुझ्या रामाप्रमाणं तुझी स्थिती होईल.
सीता०--झाली तरी हरकरत नाहीं. पण मेल्या, या माझ्या वर्तनावरून गृहिणी स्त्रियांनी आपलं सद्वर्तन कसं वज्रप्राय ठेवावं हे साऱ्या जगाच्या दृष्टोत्पत्तीला येईल.
रावण०-- बरं आहे. जगाच्या दृष्टोत्पत्तीला काय येईल ते मीच पाहीन. (जातो.)
(पुन्हा भयंकर आवाज होऊन कृत्रिम शीर गुप्त होते.)
सीता०-- अगबाई, हा काय चमत्कार?
[आकाश वाणी०]
दिंडीन करि चिंता ती राम सुखी आहे ।।
सैनिकांसह तो शांततेंत राहे ॥
ईशतेजा त्या बंधुं न शके कोणी ॥
तत्प्रभावातें यमहि जोडि पाणी ॥ १ ॥
सीता०—
पद० (क्या दिलपे दाग०)
उपकार फार झाले मुखिं जे मला वदवे ना ॥ धृ० ॥
विरहानलीं ही वाला । पोळे, तयांतचि खल हा ।
करितो असह्य बाधा । कटु वचनें करि अवमाना ॥ १ ॥
असुनी अतनु तूं नारी। झालिस मज सहायकारी।
स्त्रीसंकटा हराया। धांवेल अन्य न, ललना ॥ २ ॥
(जाते.)
प्रवेश ४ था
स्थळ : लंकेंतील रस्ता
पात्रें : अरण्यपंडीत.
अ. पं.०-- (प्र. क.) भित्र्यापाठीं ब्रह्मराक्षस. मी नको नको म्हणतो आणि एकाद लचांड बळंच येऊन मला चिकटतं. आता याना अशोक वनांत गचांड्या मिळाल्या त्याचा ताप या थेरड्याला काय ह्मणून? पण नाहीं. आजकालचा मनूच निराळा, थेरडा ह्मणजे जसा कांहीं पखालीचा बैल. आज सकाळी डोळें चोळीत उठून बसतो आणि नित्यक्रमाप्रमाणं प्रातःकाळाच्या फराळाची स्तवनं म्हणायला सुरवात करतो. तों दूत दरवाजांत हजर. डोळे उघडून `कांरे बुवा` ह्मणतो तों ह्मणे ` अरण्यपंडीत उठा आणि जा सगळ्या सरदारांना आज दरबारचें आमंत्रण करायला. अरे ह्मटलं का? तर ह्मणे सीतेला कसं वश करावं, हें आज दरबारात ठरायचं आहे. बरं आहे म्हटलं. जो उठला तो लागला पांढरी दाढी चाचपायला! एकंदरीत हे प्रणयीजनाचं कोडं फार धोंटाळ्याचं असतं खास. भो भो प्रणयीजनहो! कमाल असो तुमच्या प्रणयाची, तुमच्या प्रीतिपात्रासाठी तुह्मी हवेवर आपला उदरनिर्वाह करतां, आणि त्या हवेवरच तुह्मी आपल्या आयुष्यमंदिराचा पाया रचून त्यावर मनोराज्याचे टोलेजंग किल्ले उभारतां प्रेमी जनहो! वाऱ्याच्या प्रत्येक झुळकीबरोबर तुह्मी बदलत जातां. क्षणात लठ्ठ होतां. तर क्षणांत अगदी अशक्त होऊन मुंगीच्या फुंकाऱ्यासरसे उडून जातं. आशेनं गुलाबी मत्सरानं हिरवे, निराशानं फिकट असे आपले अनेक रंग पाहून इंद्रधनुष्य देखील पूर्ण लाजल्यामुळें ते भीतभीतच कधिंमधी लोकांच्या दृष्टीस पडतं. एवंच काय? तर अहो प्रेमळ--गाजरपारखी-प्रेमी-पिशाच्च जनहो! या तुमच्या पिशाच्च वृत्तीला या थेरड्याचा गुडघ्यापासून अष्टांग नव्हे तर शतांग नमस्कार असो.
[नमस्कार घालतो तोंच ``अधिकाऱ्या-ए अधिकाऱ्या" अशी आरोळी ऐकूं येते. अ. पं. धादलीनें उठून पाहूं लागतो.]
अ. पं०-- हें काय मध्येच लचांड आलं.? हे कोण प्रजापती इकडंच येत आहेत? हां समजलों. हे नेहमीं पाठीकडून चालणारे विपर्यासे सरदार आपल्या अधिकाऱ्या नांवाच्या दूताला घेऊन दरबाराकडे जात आहेत. आपण जरा बाजूलाच झालं पाहिजे. नाहींतर यांच्या पाठीकडून चालण्यांत आम्हांला एखादी मसालेदार गचांडी मिळायची. [बाजूला उभा राहतो.]
(विपर्यासे व अधिकाऱ्या प्र.क.)
विपर्यासे०-- अधिकाऱ्या तूं कोण आहेस? देवात जसा ब्रह्मदेव श्रेष्ठ, दैत्यांत जसा हिरण्यकश्यपू खाष्ट, चित्रकारात जसा विश्वकर्मा किंवा कलमबहाद्दरांत जसा चित्रगुप्त वरीष्ठ तसा तू दूतवर्गात अधिकाऱ्या दुष्ट किंवा स्वादिष्ट आहेस.
अ. पं०-- (स्व) आमच्या अरण्यरुदनावरहि ताण दिसते.
विपर्यासे०-- हत्तीला जशी सोंड, बैलाला जशी शेपूट, सिंहाला जशा पंजा तसा हा चाबूक तुझ्या हातांत शोभत आहे. अता आपण राजाधिराज रावणमहाराजाच्या दरबारांत जात आहोंत, तेव्हां चंद्र सूर्यांमध्यें जसा शुक्र, दोन डोळ्यांत जसे लांबलचक नाक तसें दोघांमध्ये कोणी तिसरा आल्यास हा तुझा चाबूक ताडकन्--
अधिकाऱ्या०-- ( विपर्यास्यानां चाबूक मारून) ताडकन् मारतो पहा राव.
विपर्यासे०--अयायाई? मेलो, ठार झालो. मृत पावलो. कायरे ए पाजी जिवंत दूता. हें रें काय कृत्य- काम केलेंस? [तो पुन्हा मारतो. ] अरे पण हा काय गहजब?
अधिकाऱ्या०--चुप बसा. मी अधिकाऱ्या अधिकार गाजवीत आहें. दोघांत तिसरा आल्यास ताडकन् [पुन्हा मारतो.]
विपर्यासे०-- ओय, ओय, आणखीं तिसरा कोण?
अधिकाऱ्या०--तो पलीकडे उभा असलेला थेरडा आणि मी या दोघांत आपण तिसरे म्हणून ताडकन्- [ मारतो.]
[ अ. पं. ची व विपर्यास्यांची ढकलाढकल सुरू होतें, जो मध्यें येतो त्याला तडाखा बसतो. ]
अ. पं०-- अशी ढकलाढकल कां बुवा? चाबकाचा मार खाववत नसेल तर अधिकार काढून घ्या? पण हुकमांचा विपर्यास नको व्हायला.
विपर्यासे०-- अधिकाऱ्या एखाद्या मोठ्या पर्वतावरुन एक मोठासा धोंडा गड़गड़त येऊन पर्वताच्या पायथ्याशीं बसलेल्या गुळगुळीत टकल्याच्या टाळक्यावर पडावा तसा तुझा हा चाबूक गळून खालीं पडला असं समज.
अधिकाऱ्या०-- (फटके मारीत चुकून अस्सा-मारला. पुन्हां अस्सा-मारला तर
मलाहि तुम्ही अस्सेच-मारा- (विपर्यास व अधिकाऱ्या जातात.)
अ. पं०-- (आपल्या फटक्याकडे पाहून रडत)--अवाई! केवढा पण चरचरीत फटका हा! अगदीं हुबेहूब तसाच. तिळभरसुद्धा फरक नाहीं. हा चाबकाचा फटका पाहून, हे माझे स्वर्गवासी प्रिये! मला तुझी आठवण होते ग. आज बारा वर्षांत असा फटक्यांचा सुयोग न आल्यामुळें-लाडके-तुझ्या अस्सल गाळीव प्रतीचा या थेरड्याला जरी विसर पडला होता तरी तुझ्या नित्य क्रमाच्या फराळापैकीं हा एक चरचरीत मासला पाहून, मला पुन्हा तुझी आज आठवण होऊन, पोटांत कसं भडभडून येतंय. उटतां लाथ आणि बसतां बुक्की देण्याइतकी तूं कितितरी प्रेमळ होतीस ग! लाडके-प्रिये-
[जातो]
प्रवेश ५ वा
स्थळ : रावणाचा दरबार
पात्रें : रावण, प्रहस्थ, मंत्री, अंगद, दूत.
अंगद०--अहो दरबारस्थ. परस्थळाहुन आलेल्याची कांहींच विचारपूस न करतां, स्वतःच्या गर्वांत डुलत राहिला आहांत काय? गर्विष्ठ रावणा कोणत्या धुंदीन तूं तर्रर्र झाला आहेस? जरा शुद्धीवर ये आणि तुझ्या दरबारांत शिष्टाई करण्यास आलेल्या या रामसेवक अंगदाकडे एकवार तुझी दृष्टी फेंक.
रावण०-- प्रधानजी या किष्किंधावासी काळ्या माकडांना असल्या वाष्कळ बडबडीचं जणु काय बाळकडू मिळालेलं दिसतं. जेव्हां पहावं तेव्हा नुसती कोरडी बडबड.
प्रहस्थ०-- कृतीच्या नावानं शंखध्वनी.
अंगद०—(स्व.) आम्ही असेच बडबड करणारे आहोंत. योग्य वेळी कृतीचीहि विद्युल्लता चमकल्याशिवाय राहणार नाहीं. (उ) रावणा, मी काय म्हणतों, इकडं तुझं लक्ष असूं दे. पहा---
पद० (जावोजी जाव०)
व्यापुनिया राही अवधी धरणी कमलानाथ तेजें ॥
केवळ जो सद्गुणसिंधू । तिळ नच ज्या दोषबिंदू ।
अज्ञानें नच त्या निंदू ।
ज्ञानेंदू विहरशि लंकानाथ सिंहासनिं श्री गाजे ॥ धृ० ॥
परललनेची आस जैसा जहराचा तो घातक प्याला ॥
तैशी ती रामजाया। छळिशी कां उपवनिं वांया ।
वैभव तव सिद्ध कराया ॥
त्यागुनि वैरा । करि सुविचारा मित्र रघुविरा ।
करणें हें तुज योग्य साजे ॥ १ ॥
--तसंच रावणा, तू ज्याची भक्ती करतोस तो विरुपाक्षसुद्धां श्रीरामाचं भजन करतो.
तहा-
पद० (दिले नादानक०)
शिव महा असे रत नित रामीं ॥ वि० ॥
निधिमंथनिचे विष त्या बाधे ।
प्रभुनामीं शीतल तनु हो स्वामी ॥ धृ० ॥
आदिमाया जी प्रभुजाया ती सीता ॥
राममूर्तिमंत विष्णुअंश महिकर्ता ॥
स्वैर वर्तनिं के धरिशि नृपा पैर वृथा ॥
मदा त्यागिं झणीं ज्ञानी तूं विभवार्था ।
विधि स्वयेंहि रमें भजनिं नित ज्या नामीं ॥ १ ॥
—असे असता त्याच रामाचा द्वेष करुन तूं स्वामीद्वैतांत भर टाकावीस, हें तुझ्यासारख्या सूज्ञ राजाला शोभत नाहीं. सनक सनंदन सनत्कुमार हेचसे काय, पण प्रत्यक्ष विरंचीदेखिल ज्या कमलापति रामाची स्तुती करतात. त्याला तूं शरण जाऊन आपला मित्र करणं हेंच तुला उचित आहे. जो माझा राम—
साकी०
प्रेम धरूनि मनिं भक्त अर्पितां ज्यास तीळ क्षुल्लक तो ॥
समजुति कांचनगिरिसम त्याला रक्षितसे राघव तो ॥
अंतर्बाह्य तथा। तुजवरि खचित करील दया ॥ ७ ॥
रावण०-- या रावणाचा पराक्रम सर्व त्र्यैलोक्यांत जगजाहीर असता, तुझ्यासारख्या शुल्लक माकडाच्या पांडित्यानंन् बाष्कळ शिष्ठाईनं वितळून जाण्याइतका हा ईशतेजदंडधारी राजा रावण आजच इतका निःसत्य झाला नाहीं. परंतु अंगदा, विचार कर तुझा प्राण तुला प्यारा असेल तर वाक्पांडित्याचा डौल एक क्षणभरहि न मिरवितां या तुझ्या शत्रूच्या भूमींतून आपलं काळं कर. आम्ही त्रैलोक्यपती आहोत-या भूगोलाचे आम्ही शास्ते आहोत. अर्थात् जी वस्तू आमच्याकरितां आम्ही ठेवली आहे, आमच्या सुखोपभोगासाठीं जिची नेमणूक करण्याची आम्हाला खुषी झाली. त्याबद्दल धिटाईनं मागणी करणारास देहांत शिक्षा ठोठावण्यांत निदान हा लंकाधीश तरी कमी करणार नाहीं. परंतु तुझ्या अल्पवयाकडे पाहूनच तुला क्षमा करण्यांत येत आहे.
अंगद०-- तुझ्या नकली दयाळू अंतःकरणाला हा रामसेवक अंगद लाथेखाली तुडवीत आहे, समजलास?
प्रहस्थ०-- अरे ए मर्कटा तोंड संभाळून बोल. तुझ्या या फाजील वर्तनाबद्दल तुला तुझ्या प्राणाला मुकावं लागेल समजलास? नृपतीचं वैभव चिरकाल. ठेवण्याची जबाबदारी त्या सर्वसमर्थ विरुपाक्षाच्या शिरावर आहे; इतकंच काय, परंतु परमेश्वराच्या विशिष्ठ काळजीचे दैवत जे हे त्र्यैलोक्यपती ते असली मानखंडना कधींच सहन करणार नाहींत. आमच्या बलाढ्य राक्षस सैनिकांच्या सहायानं भावी युद्धांत तुझ्या मानवी रामाला समरांगणांत उताणा पाडून त्याच्या छातीवर इंद्रजीत राजपुत्रानं अपमानाची लाथ मारून त्याचा प्राण घेतांना, त्या वनवासी रामाला आमच्याशीं शत्रुत्व धरलेल्या क्षणाची आठवण होऊन त्याबद्दल तो त्या क्षणाला शाप देत यमलोकाची वाट धरील. तसंच आजपासून याच दरबारांत आम्ही सर्व त्रैलोक्याला असं जाहीर करतों कीं, सिंहासनाभिषिक्त नृपती हे फक्त ईश्वराचेच आज्ञाधारक आहेत. इतर कोणत्याहि मानवी प्राण्यांच्या शिष्ठाईनं आमची थोर मनें द्रवणार नाहींत किंवा आपल्या बाणेदारपणाचा त्याग करुन कोणाला शरण जाणार नाहींत.
अंगद०-- नृपतीच्या सर्वसामान्य नीतीतत्त्वाचा आधार घेऊन तुमच्या अंतःकरणांत ज्याअर्थी अधर्मी उन्मत्तपणाचं जहर आपला अंमल गाजवू लागलं आहे. त्या अर्थी रावणा—
झंपा०-- (सुखे राज्य सांभाळ०)
मत्त! तव मृत्यु संनीध आला ॥
वैभवी नृपतिपद ग्रासण्याला ॥ धृ० ॥
अनथ तव जाळितो श्रेष्ठ सिंहासना ।
कुमति झणिं नेतसे तुज लयाला ॥
लंधिशी दैवता ज्यासि शिव ध्यातसे ।
रामकरिं अंत तुज समज आला ॥ १ ॥
रावण०-- अंगदा, या राज्यवैभवाच्या गोष्टी तुम्हांसारख्या झाडपालाखाऊ माकडांना काय होत. राजविलासी अजिंक्य आत्म्यांना कोणताहि सृष्टीनियम नियमन करूं शकत नाहीं; किंवा त्याच्यांवर कोणाचेहि मानपान आपली छाप बसवूं शकत नाहीत. आमच्या राक्षसी प्रभावापुढं आमच्यापेक्षां श्रेष्ठ धनुर्धरांनीं दिपून जाऊन आपआपलीं आयुधं खाली ठेऊन निमुटपणें आमच्या अजिंक्य सिंहासनाला शरण आलं पाहिजे, आमचे शब्द हेच सर्वमान्य करार आणि प्रत्यक्ष आम्हीं या अमर्याद विश्वविस्ताराचे अधिपती. पांडित्याचा दिमाख दाखविणान्या क्षुल्लक माकडा, तुझा असला फाजीलपणा पाहून मला तुझ्या जननपावित्र्याबद्दल संशय येतो.
अंगद०-- अरे चोरट्या रावणा, माझ्या जननपवित्र्याबद्दल तुला संशय येतो काय? माझ्या बापाचा तडाखा विसरला तितक्यांत? ज्या मर्दानं तुला आपल्या काखेंत दाटून धरून चतुःसमुद्राचं स्नान केलं; ज्या वीरानं तुला अनेक अपवित्र हालअपेष्टांत कुझवून तुझ्या सांप्रतच्या वैभवी तोंडाला काळी मस फांसून तुझ्या डोक्याचे पांच पाट काढले आणि तुझी टांग उलटी धरुन तुला या लेकानगरीकडे भिरकाऊन दिला त्या बलाढ्य वालीचा मी पुत्र आहे.
प्रहस्थ०-- वाः । मोठ्याच पवित्रकुलांत तुझा जन्म झालाय एकूण, नपुंसका, तुझ्या बापाला त्या क्रियानष्ट रामानं ठार मारून तुझ्या आईला-अरे प्रत्यक्ष जिच्या उदरांतून तू जन्माला आलास त्या तुझ्या तारा मातेला तुझ्या चुलत्याच्या शयनशेजेला वश करविली याची कांहींतरी लाज धरून त्या नीच रामाचा सूड घे. तो तुला घेववत नसेल तर जाऊन समुद्रात जीव दे. नाहींतर दे त्या रामाचा पक्ष सोडून नि आमच्या सैन्यात येऊन सामील हो.
रावण०--या रावणाचे वैभवहि दिवसेंदिवस वृद्धींगत होत आहे. इंद्र आम्हांला पुष्पांच्या माळा देणारा माळी. रोहिणीरंमण चंद्र आमचा छत्रधारी, रवी आमच्या राजवाड्यांत दीप लावणारा दिवेघासू नोकर, रसनायक पाणी भरणारा पाणक्या, अग्नी आमचीं वस्त्रे धुणारा परीट आणि वायू केरकचरा झाडून साफ करणारा झाडू होऊन राहिला आहे.
प्रहस्थ०--पहा, आमच्या पक्षाला येऊन मिळत असशील तर आह्मीं आधी त्या सुग्रीवाला व त्या नीच रामाला ठार मारून किष्किंधेच्या गादीवर तुझी स्थापना करूं. नाहींतर तुझ्या कुलकलंकाची द्वाही—
अंगद०--अरे माझ्या बापाच्या खेंटराची उपमा तुमच्या या सर्व राज्यवैभवाला द्यावयाची म्हणजे त्यातही तुमचा मोठा गौरव केल्याचं पातक मला लागेल. माझा बाप शक्रकुमार वाली माझ्या श्रीरामाच्या बाणानं मुक्त होऊन अक्षय सायुज्यपदावर स्थापन झाला समजलास?
प्रहस्थ०--वा: मोठाच वेदांत सांगितलास.
अंगद०-- थेरड्या मंत्र्या! तुझ्यासारख्या आपमतलबी स्वार्थी श्वानाशीं मी एक शब्द बोलूं इच्छित नाहीं. रावणा, तूं अझून सावध हो. गर्वाचा त्याग करून सारासार बुद्धीनं विचार कर. यावरही तुझी समजून पडत नसेल, तर राक्षसा निशाचरा, रणमंडळाच्या घडाडलेल्या प्रचंड होमकुंडात तुझ्या सर्व राक्षसाची आहूती देण्यासाठीं व शेवटीं शांतीसाठीं तुझ्या दशमुखांची त्यांत पूर्णाहुती द्यायला, तूं या उप्पर पातकांची कमान चढवतोस न चढवतोस-तोंच एका झणांत श्रीराम पारधी आपला चाप सज्ज करून याच ठिकाणी प्रगट होईल.
रावण०-- प्रधानजी, या क्षुद्र बीजांकुराला आत्तांच्या आत्तां-- सैनिकहो---
अंगद०--घुंगुरट्या रावणा, चुप रहा. तुझं काय सामर्थ्य असेल तें या वेळी तुझ्या मदतीला बोलाय. नाहींतर हा पहा रामसेवक अगद तुझ्या सर्व सैनिकांचे आणि दरबारस्य श्वानांचे डोळे उघडे असतांना तुझ्या सिंहासनावरून तुला खालीं ओढून ठार करतो.
(सिंहासनावर चढतो. `धरा पकडा` असा ओरडा होतो.)
अंक चवथा समाप्त.
अंक पाचवा.
प्रवेश १ ला
[वेशीचा दरवाजा, विप्रभक्षक व सर्वभक्षी पहारा करीत आहेत.]
विप्र०--कां सर्वभक्षी?
सर्व०--बोला माझं लक्ष आहेच.
विप्र०--नाहीं म्हटलं, इतका बलाढ्य शत्रू या लंकेवर आजपर्यंत कोणीच चालून आला नव्हता. आपले रावणमहाराज इतके बलीष्ठ, पण त्यांच्या—
सर्व०--तें कांहीं विचारूच नका, प्रहस्थ प्रधानजी हे आपल्या दरबारातील जाडी प्रकरण; शस्त्रास्त्रांत त्यांच्यासारखा दुसरा कोणीही प्रवीण नसतां, त्या रामाच्या सै न्यानं असला तो मोहरा अगडीनं मशकासारखा चिरडून टाकला. लाखो राक्षससैन्य रोज मृत्युमुखीं पडत आहे आणि केव्हांनां केव्हां ही संक्रांत आपणा दोघांवर वळणार.
विप्र०--मग आपलं कसंहो होणार?
सर्व०--व्हायचं तसं होणार, त्याला कोणरे बाबा काय करणार.
विप्र०--आपण मरणार नि बायका रडणार.
सर्व०--कर्मच मारणार तिथं कोण तारणार.
विप्र०-- पण मला मोठं आश्चर्य वाटतं कीं ही वानरसेना निःशस्त्र असून त्यांच्याकडून एवढा मोठा पराक्रम कसा? यांतलं मर्मच कळत नाहीं.
सर्व०--मर्म कसले नि कर्म कसलं! आपल्याच हातांनीं घराला लावायची आग नि मग बसायचं शंख करीत ; त्यातलाच हा प्रकार. हा सगळा रावणाच्या उन्मत्तपणाचा परिणाम, व्हायचं तेंच झालं आतां ओरडून आरडून काय फायदा? त्या रामसैन्याचे पवित्र मंत्र हीच त्याचीं शस्त्र. आपल्या राक्षससैन्याकडून बाणांचा एकसारखा वर्षाव केला जातो. तरवारीवर तरवार सारखी तुटून पडते आणि अस्त्रांवर प्रतिअस्त्रं सोडली जातात, पण त्यापैकी एकाचाहि त्या रामसैन्यांवर परिणाम दिसून येत नाहीं. तीं माकडं आपल्या भुजबलांनीं प्रचंड पर्वत आणून आपल्या राक्षससैन्यांवर धडाधड फेंकून त्यांना जागच्याजागी गाडून फस्त करीत आहेत. असा कांहीं—
विप्र०-- विपरीत प्रकार होत आहे म्हणायचा.
(आळीपाळीने पहाऱ्यावर फिरुं लागतात.)
विप्र०-- पण काय हो सर्वभक्षी?
सर्व०--लक्ष आहे. चालूंद्या पुढं.
विप्र०-- म्हटलं इतका प्रळय होत आहे तरी रावण महाराज कसे स्तब्ध बसलेत? कांहीं समजत नाहीं.
सर्व०--तुम्हांलाच उमजत नाही. कालचा गोंधळ तुम्हांला माहीत नाही वाटतं?
विप्र०--नाही बुवा. कसला गोंधळ?
सर्व०--अहो, प्रहस्थप्रधानादि अनेक योध्दे ठार झाल्यावर रावण महाराजांना मोठी चिंता पडली. पण तोही कसला बहाद्दर! लागलीच त्यानं कुंभकर्णाला उठविण्याची हांक फोडली.
विप्र०--(आनंदाने उड्या मारीत वाहवा! वाहवा!! खाशी! खाशी!! ठीकठाक! अहो या असंख्य वानरदळाला तो एकटा सहज अगदी दांताला दांत न लावता गिळून टाकील. भले भले! खूप योजना केली. पण तो मध्यंतरीच बरा जागा झाला.
सर्व०--झाला म्हणजे? तसाच ओरडाओरडा केला. रावण महाराजांची आज्ञा सुटतांच आपले सर्व राक्षस निद्रागृहाच्या दरवाज्याजवळ जाऊन आक्रोश करून ओरडूं लागला. त्या गर्जनेनं मोठमोठ्या विहीरी नि तलाव पार आटून गेले आणि हेंचसं काय पण हा महाशंखध्वनीं स्वर्गाचीं कपाटं फोडून पार गेला. त्यानं देवादिकांची जी तिरपीट उडवली ती काय विचारुंच नका. पण तो कुंभकर्ण बहाद्दर कशाला जागृत होतोय.
विप्र०--आपल्या राक्षसी वीरांचा प्रतापच अद्भुत! बरं मग पुढं काय झाल?
सर्व०--एवढ्यानं जेव्हा कार्य भागेना, तेव्हां प्रचंड माजलेले हत्ती स्वारींच्या आंगावरून चालविले. गगनचुंबित वृक्ष घेऊन नाकांत घुसविले. एक नाकपुडी दाबून श्वास कोंडून पाहिला, मोठमोठे पाषाण आणून त्याच्या ऊरावर आपटले. कडू तीक्ष्ण औषधं आणून नाकांत ओतली, सर्व कांही केलं—
विप्र०--पण स्वारी कांही केल्या जागी होईना आँ? ठीक.
सर्व०--मग विरुपाक्ष किन्नरी आणून त्याच्या कानांशी जेव्हा वाजविली—
विप्र०--तेव्हा स्वारी जागी झाली म्हणायची! ठीक आतां रामसैन्याचा चुराडा उडालाच पाहिजे. [आंतून मारुती०-- रामसैनिकहो, पहातां काय? या राक्षसाना ठिकच्याठिकाणी गाडून फस्त करा.]
विप्र०--हं! सर्वभक्षी पळा पळा. तो पहा मारुती आला.
सर्व०--अरे पण पहारा कसा सोडायचा?
प्र०--बरं पण, त्यानीं इथं आपल्याला ठार केलं तर आपली प्रेतं तरि कसा पहारा करणार?
सर्व०--हं.! मग पळाच आतां-- [जातात.]
(मारुती, बिभीषण, सुग्रीव, जाबुवंत व सैनिक प्र. क.)
मारुती०--इंद्रजीताच्या कपटी होमगृहाचा मार्ग हाच असावा. कारण—
पद (हा सकल देह०)
हा धूम्रलोट कडकडाट वन्हिया गमे ॥
जळत मांस तापदसा श्वास हा वमे ॥ धृ० ॥
थबथब हें गळत रुधिर । भूमिरूप भयद प्रखर ।
कपटहोम करि तस्कर । याच स्थलिं श्रमें ॥ ५ ॥
बिभीषण०-- मारुता, तुझा तर्क अगदीं बरोबर आहे. हेंच तें त्या दुर्जनाच्या कपटी होमाचें गुप्तस्थान. परंतु आतां एवढंच लक्षांत ठेवा--
दिंडी
तपा आचरि हा कुमती ज्या सुकार्या ।
अश्वसारथिसह इंद्ररथ वराया ॥
अर्धरथ तो जाहला प्राप्त आतां ।
पूर्ण मिळतां तो करिल विश्व-घाता ॥ १ ॥
सुग्रीव०--तो पहा. त्या होमप्रदेशाचा अंतर्भाग आता स्पष्ट दिसूं लागला तो पापमूर्ती इंद्रजीत रक्तोदकानं स्नान करून, रक्तवर्णाचेंच वस्त्र नेसला आहे. मृत मनुष्यांची सात प्रेतं खाली पसरून त्यावर तो दुष्ट वज्रासन घालून बसला आहे. आपल्या पिंगट जटा मोकळ्या करून डोळे मिटून विप्रदंताच्या लाह्या हळूंहळूं अग्नीत टाकीत आहे. काय अघोर हें कृत्य.
जांबुवंत०--तसंच से पलिकडं काय आहे. दिसतंय का तुह्माला? तुमचे आहेत तरणे डोळे मी काय बोलून चालून पडलों ह्मातारा वृद्ध कपी. ते पहा त्या नीच अघोरी इंद्रजीतानं अग्नीला आहुती देण्यासाठीं ब्राह्मणांच्या प्रेतांचे ढीगच्या ढीग ठेवलेत.
मारुती०-- राक्षसांच्या हातूंन राक्षसीय कृत्यें व्हायची. पण आजोबा मला आज मोठा आनंद होत आहे, आणि तो याचकरिता-
पद० (तरि बंधिन काय.)
मम रिपुसि आज मी दधितो ॥ धृ. ॥
तत्तनु-रुधिरा सिंचुनि मम करिं समरभूमि तोषवितों ॥ १ ॥
रिपुरुंडांच्या मालाद्वारें विजयस्तंभ भूषवितों ॥ २ ॥
रामनाम तें गर्जुनि आतां रिपुकंठा भी चिरितों ॥३॥
आणि याच क्षणीं बंधो बिभीपणा, आपल्याला प्रतिज्ञा करून सांगून ठेवतों की रामेश्व राच्या किनान्यावर श्रीरामानीं तुह्यला लंकाराज्याचा जो राज्याभिषेक केला तो आम्हीं आतां खास फलद्रूप करणार.
बिभीषण०-- आपण सर्व शक्तिमान आहांत. परंतु-
पद० (अवन जगावी )
क्षण न विसंबा वांया स्थलिं या ॥
होउं न द्या कधि सफल कार्य कुजन करित
रिपु तव झणीं तयातें वधि ॥ धृ० ॥
संधि दवडितां पूर्ण रथासह ॥
इंद्रजीत हा त्रैलोक्यासह ॥
भस्म करिल सर्वां तधि ॥ १ ॥
-चला आतां. शुभस्य शीघ्रम्. मी मात्र तेथवर येणार नाहीं.
(सर्व जयघोष करून जातात.)
प्रवेश २ रा
स्थळ : इंद्रजिताचें कपटहोमगृह
[स्थळ; इंद्रजीत यज्ञात आहूती देत बसला आहे.]
इंद्रजीत०--
पद० (शृंगा ताडोनी)
वंदन अमरेशा! तुजला करि रावणसुत हा ॥
यश मम यज्ञाला देई अर्पुनि जयरथ हा ॥ धृ० ॥
अश्वां सारथिला त्या रथिं पाठवी स्थापुनियां ॥
विनवित सविनय भी आलो शरण इंद्रजित हा ॥
विसरुनियां द्वैता तसे मत्कृत अपराधा ॥
श्रृंगारी लंका विजयानें चिर करि रणजय हा ॥ २ ॥
--हा एवढा माझा यज्ञ शेवटाला गेला तर त्या नीच रामासारखे कोट्यावधी वीर मी हां हां म्हणतां रसातळाला नेईन. प्रत्यक्ष शेषाच्या मस्तकावर लाथ मारून हा भूगोल डळमळून सोडीन अथवा माझ्या अस्त्रांच्या सहाय्यानें आणि या विजयरथाच्या प्राप्तीनें आकाश पाताळ एक करून कल्पांताला आत्तांच आमंत्रण करीन आणि निमिषार्धांत या सर्व ब्रह्मांडाचा नायनाट करीन तरच नांवाचा रावणसुत इंद्रजीत. ताता रावणा—
पद० (अब तोरे वाकी०)
मनिं धरि शांती कार्य तव सफलहि करित मी ॥
खास आज विजय वरुनि ॥ धृ० ॥
रामसैनिकां रणीं वधाया।
इंद्रदत्त रथ मिळंविन क्षणिं ॥ १ ॥
--असो. आतां ध्यानस्थ बसांवं. [तसें करतो.]
[मारुती, सुग्रीव, जांबुवंत, रामसैनिक प्र. क.]
मारुती०--रामभक्त हो, हं : चला आटपा. हा पहा तो नीच राक्षस. करा त्याच्या यज्ञाचा विध्वंस. मी घेतो त्या दुष्टाचा समाचार.
[रामसैनिक जयघोष करून पक्षाचा विध्वंस करतात.]
सुग्रीव०--यज्ञाचा विध्वंस झाला आणि अर्धा वर आलेला विजयरथहि नष्ट झाला ; परंतु या अधमाची समाधी कांहीं उतरली नाहीं. कमाल आहे!
जांबुवंत०--तो आपल्या भावी वैभवांत आणि पराक्रमात गुंग राहून स्वप्नांतल्या स्वप्नांत ऐश्वर्याच्या मिटक्या भारतीय बेटा. लाथ मारा हरामखोराच्या.
मारुती०--[इंद्रजीताला लाथ मारून] अधमा घातक्या राक्षसा!
इंद्रजीत०--(क्रोधानें उभा राहून) काय? इतक्याही गुप्त ठिकाणी येऊन या माकडांनीं माझ्या यज्ञाचा विध्वंस केला? मशका, काळतोंड्या माकडा । यज्ञाचा विध्वंस करून चाललास कुठं? तुला येथून जिवंत सोडीन तेव्हांच ना तुझ्या रामाच्या दिग्विजयाचा झेंडा फडकणार? [त्याच्या आगावर धावून जातो.]
मारुती०--[त्याला खाली पाडून त्यांच्या उरावर बसतो.] दैत्यपुत्रा! कोण कोणाला जिवंत ठेवतो याचं प्रत्यंतर तुला अतांच दाखवितों.
इंद्रजीत०--चोरा, मी बेसावध असताना तूं चोरट्याप्रमाणं माझ्या यज्ञविवरांत प्रवेश करून यज्ञाचा विध्वंस केलास. पण अझून तुला या इंद्रजीताचा पराक्रम पाह्याचा असेल तर क्षत्रिय धर्मानुसार माझ्याशीं धर्मयुद्ध कर. मी हां हां म्हणता तुझें नरडें कडकडा फोडून माझ्या यज्ञांत तुझी आणि तुझ्या सर्व रामसैनिकाची आहुती देतों.
मारुती०--अरे जा गशका मोठ्या सांगतोय क्षत्रियत्वाच्या गोष्टी नि धर्मयुद्धाचा बाणा! अशोकवनात दिलेले तडाखे विसरलास? पतिव्रतांचा छल करतांना धर्मयुद्धाचींच पारायणं केलीं होतीं वाटतं? तुमच्या नरड्यावर तुमचा काळ बसल्यावर तुम्हांला धर्म आठवला काय? नीचानों! तुमच्या सर्वांच्या रक्तांनीं लंकेच्या समरदेवतेला स्नान घालून तुमच्या पातकांचा मळ पूर्ण धुतल्याखेरीज आम्ही रामभक्त रघुवीराच्या दिग्विजयाचा झेंडा लेकेंच्या तटावर कधींच उभारणार नाहीं समजलात? म्हणे धर्मयुद्ध कर!
इंद्रजीत०--अरे कशाला सांगतोस त्या तुझ्या मानवी रामाची बढाई? त्याला समरांगणांत उताणा पाडून त्याच्या छातीवर अपमानाची लाथ मारून त्याचा प्राण घेण्यासाठींच या इंद्रजीताचा अवतार आहे समजलास?
जांबुवंत०--त्याला उताणा पाडशील तेव्हां पाडशील. सध्यां तुझ्या उरावर कोण बसलाय त्याचा कांहीं विचार कर.
इंद्रजीत०--त्यांत काय विचार करायचा, हा पहा माझा पराक्रम । [मारुतीचें व याचें द्वंद्व होतें.]
मारुती०--(त्याला पुन्हा खालीं पाडून) आजोबा, या अघोरी राक्षसांशीं बोलण्यात काय अर्थ? राक्षसा निशाचरा, ज्या मुखानं आमच्या श्रीरामाची निंदा केलीस त्यातील-ही बघ -जीभ खेचून तुला यमसदनाला पाठवितों.
जांबुवंत०--[त्याचा हात धरून] हां हां हां! हनुमंता, वाल्मिक वचनाला बाध कसा आणतोस?
मारुती०--ह्मणजे?
जांबुवंत०--[त्याच्या कानात सांगतो] असं आहे.
मारुती०--तरी पण याला असंच सोडणं घातक आहे. [इंद्रजिताच्या छातीवर लाथ मारतो.] याला सध्या ही शिक्षा पुरें आहे.
(रामभक्त जयघोष करून जातात.)
इंद्रजीत०--[ शुद्धी आल्यावर उठून बसतो.] हर हर! अगदी कार्यसिद्धीच्या वेळी काय ही माझी दुर्दशा । माझा अक्षय विजयी रथ अगदीं पूर्ण होऊन माझ्या हातांत पडणार, तोंच या दुष्ट माकडांचा घाला एवढ्याही गुप्त जागीं येऊन पडला ना? शिव शिव! आमचा सर्वस्वी घात झाला. आमच्या उन्मत्तपणाच्या महासागराला आजच ओहटी लागली, आणि आमच्या अंतकाळाचें स्वप्न आह्मांला आजच पडलें. जो मी वीर छातीवर हात मारून--[छातीवर मारलेली लाथ पाहून क्रोधानें] काय? माझ्या छातीवर हा लत्ताप्रहार कोणाचा? हं: समजलों. माझें नरडें दाबून मला बेशुद्ध केल्यावर त्या काळतोंड्या माकडानं दिलेला हा लत्ताप्रहार काय? प्रत्यक्ष बापासारखा चुलता कुंभकर्ण त्या माकडांनी समरांगणांत हाणून पाडल्यावर कोणाचं मस्तक क्रोधानं भडकून जाणार नाहीं? स्वतःच्या छातीवर वैऱ्याचा लत्ताप्रहार पाहून त्याचा कंठ चरचरा चिरून सूडाची भरपाई कोण करून घेणार नाहीं? आणि एक्या हाडामासाचा कोणता अस्सल बीज वंशज आपल्या कुटुंबाचा उच्छेद करणाऱ्या घरभेद्यांचा नायनाट केल्यावांचून स्वस्थ बसेल? कांहीं हरकत नाहीं. कोण आहे रे तिकडे? माझा रथ तयार करा. मर्कटांनो, तुम्हीं माझ्या `यज्ञाचा विध्वंस केलात, पण पहा आतां य इंद्राजीताचा पराक्रम! त्या नीच रामाच्या नरडीचा घोंट घेऊन त्याच्या अस्थी या माझ्या दांतांनीं कडकडां फोडल्याशिवाय माझा क्रोधाग्नी कधींच शांत होणार नाहीं.
[जातो.]
प्रवेश 3 रा
स्थळ०--समरभूमीचा रस्ता
[लक्ष्मण सैनिकांसह प्रवेश करतो.]
लक्ष्मण०-- शाबास, बहाद्दर रामसैनिकहो! आपण सर्वांनी विजयादशमीच्या सुमुहूर्तावर प्रारंभ केलेली सीता-शुद्धीची मोहीम आतां खास फलद्रुप होणार. कुंभकर्णासारखा बलाढ्य योद्धा प्रथम समरांगणात येतांच त्याचा शौर्यपर्वतावरहि ज्याअर्थी आपल्या पराक्रमाचं वज्र लागूं पडून त्याचा एका निमिषार्धांत चक्काचूर झाला, त्याअर्थी दैव आपल्यालाच अनुकूळ आहे खास. तेव्हां वीरहो, ज्याप्रमाणं तुम्ही सर्व या वेळेपर्यंत रामनामाच्या आधारानं त्याच पुण्यपुरुषाची कांस धरून ऐक्यभावानं एकमेकांना धीर देऊन दृढनिश्चयानं लढलात त्याचप्रमाणं आणखी थोडा नेट धरून सीतामुक्तीचं अत्यंत पावन व्रत तडीला नेऊन पोंचवा. मृत्यूची भीती बाळगून समरांगणांत कचर खाऊं नका. कारण जन्ममरणाच्या फेर्ऱ्यांतून कोणताही प्राणी सूटत नाहीं. शत्रूंशीं लढता लढता समरांगणांत मृत्यू आला तर धारातीर्थात पतन पावल्यामुळें स्वर्गलोकच्या मुक्तीच्या तेजस्वी मंदिरांत तुमचा प्रवेश मोठ्या थाटामाटानें साजरा करण्याकरितां तेथल्या अप्सरा हातांत पंचारत्या घेऊन तुम्हांला ओंवाळण्यासाठी सज्ज राहतील आणि विजय मिळविलात तर सीतादर्शन होऊन स्वामीकार्यसाफल्यतेचं उत्तम उदाहरण जगाला दाखवाल आणि अजरामर झेंडा यावच्चंद्रदिवाकरौ फडकत ठेवाल. एका इंद्रजीताला समरांत ठार केला की रावणासारखे कोट्यवधी वीर मी एका क्षणांत रसातळाला नेईन.
सुग्रीव०--आपली आज्ञा आम्हांला शिरसावंद्य आहे. आपला इषारा होतांच आम्ही एकजात रामसैनिक या लंकेच्या किल्ल्यावर हल्ला करून सीतामुक्तीचा राजमार्ग अगदी हां हां म्हणता सुलभ करू.
[आतून :--इंद्रजीत--
श्लोक--
कोठें जाशिल थांब थांब मनुजा रामानुजा जंबुका ॥
तोंडीं बाष्कळ वल्गना करिशि कां गर्वे अशा या फुका ॥
आला काळ तुम्हांस खास गिळण्या माता पित्याला स्मरा ॥
वारा हें प्रखरशस्त्र घातक अती सौख्यें स्वअंता वरा ॥ १ ॥]
लक्ष्मण०--(क्रोधानें) उन्मत्ता. कोणाला सांगतोस तुझ्या या प्रखरास्त्राचा प्रताप? मी तुझ्या सर्व अस्त्रांना आतांच आव्हान करतों. आमच्या पुण्यशील मातापित्याचं स्मरण तर आम्ही पदोपदी करतोच. परंतु उन्मत्तानो, ज्या महाख्यात रघूनं आपल्या शौर्याच्या प्रखर तेजानं एक वेळ या सर्व पृथ्वीला थक्क करून सोडलं होतं आणि आपल्या अजिंक्य अस्त्रप्रभावानं तुमच्यासारख्या अनेक राक्षसांनां जर्जर करून दे माय धरणी ठाय करायला लावलं होतं त्याच थोर रघुचा हा अस्सल वंशज तुला एकच शक्तीप्रभावानं जागच्या जागी ठार करतो. मी जर आज सतत चौदा वर्षे निराहार राहून ब्रम्हचर्यव्रतानं बंधूसेवा करीत असेन तर ही अस्त्रशक्ती तुला अखेरचाच मोक्ष देईल. जा (बाण सोडतो. आंतून:-- "ठार झालो. मेलों ऐकूं येते.] - चला. सैनिकहो, श्रीरामाला हें सर्व वृत्त कळवून पुढच्या रावणवधाची सांगता करूं.
[जातात.]
प्रवेश ४ था
स्थळ: अरण्यरस्ता
[विप्रभक्षक व सर्वभक्षी समोरासमोर येऊन भेटतात.]
विप्र०--बाबा सर्वभक्षे—
सर्व०—बाबा विप्रभक्षका—
विप्र०--आतां आपलं कसंरे होणार?
सर्व०--मी तरि त्याच काळजीत आहे रे बाबा.
विप्र०--आपण आता दोघेहि मरणार.
सर्व०—मरतांना एकदम मेलों तर पत्करलं. परंतु एकामागून एक मेलों तर मात्र पंचाईत कारण जो आधीं मरेलतो भूत होऊन दुसऱ्याच्या बोकांडी बसेल.
विप्र०--अरे बाबा, त्या भूतांच्या आणि पिशाच्चांच्या गोष्टीच काढूं नकोस. आतांशी या लंकेंत भूताटकीचा अगदीं सुळसुळाट उडाला आहे. जेवढे राक्षस या युद्धांत मेले तितके सारे भूत होऊन आपापल्या घरांत ओरडत फिरत असतात. साऱ्या रस्त्यावर रात्रीं अपरात्रीं रडत असतात. त्या भूतांच्या चेष्टांमुळें त्या राक्षसांची बायका पोरं भेदरली जाऊन तीं देखील अर्धीमुर्धी पिशाच्चं बनत चाललीं आहेत.
सर्व०-- मग मी असं म्हणतों यदाकदाचित् रावण महाराजांना या मोहिमेंत विजय मिळाला तर या असल्या पिशाच्च खैसांच्या राजधानीवर राज्य चालवायला त्यांना जरा कठीणच पडेल.
विप्र०--यांत काय कठीण पडणार आहे त्यांना? कारण जितके राक्षस मेले तितके सारे पिशाच्च होऊन आपआपल्या जागेवर रूजू होतील. प्रहस्थ प्रधानजी मेले तरी ते भूत होऊन प्रधानकीचीं वस्त्रें पुन्हा घेतील. इंग्रजीत युवराज, कुंभकर्ण मारे सगळी जाडीं धेंडं पूर्ववत् आपआपल्या दर्जावर खैस म्हसोबांच्या रूपानं विराजमान होतील. मग अशा रीतीनें ही लंका वेताळाचं साम्राज्य झाल्यावर सर्व प्रजा भुतं आणि रावणराजे जिवंत पिशाच्च, मग हा खैसपिशाच्च राज्याचा गाडा अगदीं सुरळीत चालेल.
सर्व०--अरे पण गड्या, त्यांत एक युक्ती आहे. या भूतांच्या आदलाबदलीत आणखी एक चांगली संधी साधून आपण या दूतवृत्तीला कायमचा रामराम ठोकावा आणि एखादा चांगला वरचा दर्जा पटकावावा.
विप्र०--अरे पण, त्यासाठीं आपण आधीं मेलं पाहिजे.
सर्व०--तर ठरलंचम्हणा. कारण मृत्यू आपली इच्छा पुरी करायला अगदीं आ पसरून बसला आहे आपण हो म्हणायचाअवकाश कीं त्यानं गटकावलंच समज.
विप्र०--पण त्यानं आपल्याला गटकावलं आणि आपल्यालापुन्हा भूत होण्यासाठी जर ओंकून बाहेर टाकलं नाहीं तर मग कसं काय करायचं?
सर्व०--अं:! त्यांत कसली अडचण? मृत्यूनं आपल्याला गिळले आणि आपण त्याच्या पोटांत जाऊन पडलों कीं मग आपण त्याच्या पचनीं पडायचंच नाहीं. मग तर अडचण नाहीं ना! हं: आता आपल्या मृत्युयात्रेची तयारी केलीच पाहिजे. आणि गड्या, आतां रावणं वन्दे-रावणं वन्दे म्हणू नकोस. आतां मरणं वन्दे-मरणं वन्दे म्हणायची संवय ठेव.
[आंतून:--हा षंढानो | लढाईला भिऊन आपली काळीं तोंड घेऊन इकडे पळून आलात? आजपर्यंत ज्याचं अन्न खाल्लं त्याच्यावर प्रसंग गुजरला असता समरांगणांत कचर खाऊन मागें फिरतां? धि:कार असो तुम्हांला.]
विप्र०--हां! ते आपले नवीन सेनापती रागावून इकडंच येत आहेत तर चल आधीं पळून जाऊं.
सर्व०--( त्वेषानें ) काय करूं रे! जिवंतपणीच पिशाच्च होण्याची युक्ती जर मला माहीत असती तर मी आतांच खैस म्हसोबा होऊन या सेनापतीच्या बोकांडी बसलों असतों. मरा म्हणून फुकटचा उपदेश करायला यांच्या बापाचं काय खर्च होते?
विप्र०--पिशाच्चझाल्यावर मी आधीं याच्याच बोकांडीं बसणार. चला आतां पळा.
पुढचं पुढं!
(जातात.)
प्रवेश ५ वा
स्थळ: समरांगण
[रावण हताश होऊन समरभूमीवर पडला आहे.]
रावण०--मी कुठं आहे? मी शुद्धीवर आहे ना? अरे पण! हा काय चमत्कार?—
पद. ( रघुराया सदया० )
मम नयनां दिसतो रामरिपू हा भरूनि उरे
रथीरचरीं आजि कसा || धृ० || भूमि राम ही
तरूवर अरीस्वरूपीं । अंत न या मूर्तीतें ।
मतिभ्रम हा जडला ॥ १ ॥
--पण हा सारा भ्रम आहे आणि ही समरभूमी आहे. हाय! हाय राक्षस सैनिकही! हा पहा तुमचा लंकानाथ रावण आज हताश होऊन लकेच्याच समरभूमीवर पडला आहे. माझ्या अविचारानं देखतांदेखत पाठचे भाऊ, पोटचे पुत्र आणि पौत्र यांचा अगदीं थोडया काळांत सत्यानाश करून, अखेर पत्नीवर बलात्कार झालेला दाखवीला. काय माझें नशीब! जो मी रावण रत्नजडीत सिंहासनावर बसत होतो; ज्या माझ्यावर चंद्र छत्र धरीत होता आणि जो मी पंचमहाभूतांवर अंमल चालवीत असें, तोच मी लंकाधीश आज अनाथ व दुबळा होऊन रक्तांनीं भिजून चिंब झालेल्या समरांगणांतल्या मातीवर पडलों असतां माझे ते छत्रधारी सेवक माझ्याकडे पाहून थट्टेने हांसत आहेत. राज काय किंवा महाराजाधीराज काय, जोंपर्यंत तो घोड्यावर आहे तोंपर्यंत हे सारे त्याच्यापुढें हांजी हांजी करतील; पण त्यांनीं एकदां घोड्यावरून खालीं पाऊल टाकलं पुरे कीं हे कृतघ्न सेवक त्याच्या तोंडावर लत्ताप्रहारहि करायला चुकायचे नाहींत. करा बाबानों करा. आतां काळ तुम्हांला अनुकूल आहे. बिभीषणा, तुझ्या उपदेशाचा ज्यावेळेला मी धिःकार केला आणि तुला नाहीं नाहीं ती दुरुत्तरं बोललों तो काळ आतां मला पूर्ण डांचत आहे. परंतु बिभीषणा, तू असा घरभेद्येपणा करून मला काळाच्या तोंडीं द्यायचे नव्हतेस रे! बिभीषणा! मी रामस्वरूपाला पूर्ण ओळखतो. त्याचा पवित्र बाण माझ्या हृदयांत शिरावा यासाठींच मी विरोधभक्तीचें उदाहरण सर्व जगाला दाखवीत आहे. अरे! पण या गृधादिकांनी या समरभूमीवर अगदीं ताळच ठेवला नाहीं. अरे, माझ्या अवयवांचा इतक्यांतच बोंचबोंचून का फन्ना उडवतां? या रावणाच्या प्रचंड देहाची अखेरीस, तुतुम्हांलाच मेजवानी होणार आहे. पण बाबानों! इतकी उतावळी कां करतां? या रावणाचे हे पाणीदार डोळे त्यानं शत्रूंवर वटारले असतां त्याचा देह एका क्षणांत भस्मीभूत व्हायचा, त्यांतील ही अश्रूंनी डबडबलेली बुबुळं थोड्या वेळांनी तुमचा भडकलेला जठराग्नी शांत करतील. ही माझी कसलेली वज्रप्राय छाती जिच्यावर अनेक अमूल्य रत्नजडीत हार रुळत असत, जिच्यावर या रावणानं अनेक प्रसंगी आपल्या मर्दुमकीच्या आवेशांत मी मी म्हणून हस्तप्रहार केले, ज्या याच भाग्यवान् छातीनं पट्टराणी मंडोदरीला प्रेमानं दृढालिंगन देऊन तिच्या वदनचंद्राचं अधरामृत मी प्राशन केलं आणि ज्या याच छातीला त्या जानकीच्या आलिंगनाची इतके दिवस आशा लावून ठेवली होती. तीच छाती आणखीं कांहीं वेळानं त्यातील रक्तमांसादि खाऊन टांकून तिला हाडांचा पोंकळ पिंजरा करून ठेवाल. हाय हाय! माझ्यामागे त्या माझ्या जिवलग मंडोदरींची आतां काय भयंकर अवस्था होईल? प्रिये-
पद. ( निज मख रक्षाया. )
अवगणूनी वांया । मंगलशा त्या । उपदेशा नीचानें ॥ धृ० ॥
त्रैलोक्याचें वैभव गत तें हत तव पति हो अविचारानें ॥ १ ॥
वैधव्याच्या पंकीं तुजला फेंकुनि दिधलें या अधमानें ॥२ ॥
विसरूनि विभवाला । भवाला । ध्याई तूं शिवाला ॥
याविण दुसरा मार्ग नसे तुज ॥ सौख्य तुला दिधलें नच पतिनें ॥ ३ ॥
-- कर्मगती कधींच चुकणार नाहीं. अंतकाळी या रावणाच्या बरोबर शुष्क मृत्तिकासुद्धा येत नाहीं ना? माती तर राहूंद्याच पण मृत्युमुखांत पडते वेळी तोंडांत घोटभर पाणी घालायला देखिल जवळ पुत्र नसावा काय? बरोबरच आहे –
साकी.
राव रंक हा भेद भूवरीं ईशगृहीं सम सारें ॥
रविकिरणापरि विविध स्थलातें भूषविती क्षणमात्रें ॥
परतचि ते फिरतां । होते प्राप्त तया समता ॥ १ ॥
[ आंतून " जय जय रघुवीर समर्थ "जयघोष होतो. ]
रावण०--काय? माझ्या शत्रूचा जयघोष? आणि तो या लंकेच्या समरांगणावर? तो मी कधीच सहन करणार नाहीं [ उठून धनुष्य बाण सांवरतो. ]
राम०--( आंतून) रावणा, या ब्रह्मास्त्राची शक्ती संभाळ.
रावण०--तुझ्या ब्रह्मास्त्रावर--हें पहा--[इतक्यांत शक्ती लागून रावण खालीं पडतो.] राम राम राम [मरतो.]
[रामसैनिक प्र. क. राम त्वेषानें प्रवेश करून रावणाच्या उरावर एक पाय देऊन उभा राहतो.]
राम०--सेनापती, युद्ध बंद करा. कर्णे, तुताऱ्या, शिंगे फुंकून रावणवधाची निशाणी म्हणून आपल्या दिग्विजयाचा झेंडा लंकेच्या तटावर उभा करा. पळून जात असलेल्या राक्षससैनिकांवर बाणांची वृष्टी बंद करा. नि हतबल झालेल्या सैनिकांना पूर्ण जीवदान दिल्याची द्वाही सगळ्या समरांगणावर डंका वाजवून जाहीर करा.
सुग्रीव०--ठीक आहे. आज्ञेप्रमाणें व्यवस्था ठेवतो. [जातो.]
मारुती०--श्रीरामा, रावणाची प्राणज्योत पंचतत्वाला मिळाली.
राम०--होय खरेंच. [त्याच्या प्रेतास वंदन करून] शाबास रावणा शाबास! तुझ्यासारखा पराक्रमी योद्धा तूंच. तुझ्या शौर्याची बरोबरी करणारा वीर मागें कधीं झाला नाही न पुढे कधी होणार नाहीं. सैनिक हो!
पद. (रघुवीरपदी रमुनि० )
हा हत पडे समरि मम धनुला ॥
रावण वरि अंताला ॥ धृ० ॥ इहलोकीचें वैभव
सारे गेलें नच संगतिला ॥ १ ॥ सत्कृति जाते मात्र
बरोबर कुमति चुकवि सग्दतिला ॥ २ ॥
॥ चाल ॥
ज्यानें दानव देव थोर अवघे कारागृहीं घातले ।।
वायू सूर्य विरंची इंद्र प्रबलां तत्सेवनीं योजिले ॥
ज्याचा धाक अगाध ऐकुनि मनीं अंबापती कांपला ||
तो हा रावण संगरांत पडतां तेजोगिरी लोपला ॥
रणजय वरि सत्याला ॥ ३ ॥
परंतु यानं मरतांना माझं नाव उच्चारलं, त्याअर्थी याला आतां सद्गतीच मिळेल. वास्तवि पहातां रावणा –
पद्यार्ध
वाटे भक्त मदीय तूंच करूनी भक्ती विरोधी पुरी ॥
अंतीं अक्षय मोक्षसद्यत्पदिं स्वयें सेवी खरी माधुरी ॥
कोणी काय निमित्त भक्ती करतो तें सर्व मातें कळे ॥
अंतीं तारक मीच एक सकलां हें तत्व ज्यातें कळे ॥
तो जन मुक्तिस गेला ॥ ४ ॥
असो सौमित्रा, हें धनुष्य आणि हा माता संभाळ!
लक्ष्मण०--म्हणजे?
राम०--रावण मुक्तीला नेऊन देवादिकांची याच्या दास्यत्वांतून मुक्तता केली. आमचें अवताराचें कृत्य येथून संपलें.
बिभीषण०--[ शोकाकुल प्र. क. रावणाच्या शवावर पडतो.] बंधो रावणा, काय तुझा हा अंत!
पद. ( मोरे कान भनकवा० )
मज काय जगतिं या उरले ॥
सारे हें जग वाटतसे शून्यचि ।
तुजविण लंकाधिपते! ॥ धृ० ॥
बळ अद्भुत तें आटे सर्वहि ।
तप तव दारूण काय विफल तें।
वेदखंड करणार चतुर तूं
सकल गुणनिधे ॥ १ ॥
राम०--[त्यास उठवून] बिभीषणा, अरे तूं विवेकाचा सिंधू असून नाशिवंताचा शोक करतोस? पहा-
पद. ( माझें हृदय पोळत० )
या क्षणभंगुर जगतितलीं चिरमयसे कांहीही नसे ॥ धृ० ॥
जल बुधबुद्वत माया मतिस व्यापिते ॥
कौटुंबिक सुखदुःखा सतत दाविते ॥
परि अंती सर्व निराधार सत्य तें ॥
मिळतें कृतककर्मांकित नित फल मात्र योग्यसें ॥ १ ॥
बिभीषण०--श्रीरामा, तुझ्या अमृतमय वचनानें माझा शोक पार नाहींसा झाला.
मारुती०--(स्व.) ` सीता घेऊन ये` अशी आज्ञा श्रीराम कधी करतात कोण जाणें?
राम०--लक्ष्मणा! तो पहा, रावणाच्या ऐंशी हजार राण्यांचा समूह शोक करीत मंडोदरीसह इकडेंच येत आहे, तर तू या बिभीषणाकडून त्यांची नीट समजूत घाल, आणि लंकेतले सर्व रहिवाशी शांत करून बिभीषणाची लंकेच्या गादीवर स्थापना कर.
लक्ष्मण०--जशी आज्ञा. बंधो बिभीषणा चलावं आपण.
बिभीषण०--मी तर येतोंच. परंतु श्रीरामानी कृपा करून लकानगरींत प्रवेश करावा.
राम०—बिभीषणा
पद. ( माई मोरे नयन० )
मम करिं लंका दान तुम्हांला ॥ धृ० ॥
कन्येसम ती नगरी-बाला प्रियकर आम्हांला ॥ १ ॥
म्हणुनि आगमन योग्य न दिसतें कन्यासदनाला ॥ २ ॥
आनंदानें करि कन्येच्या पाणिग्रहणाला ॥ ३ ॥
बिभीषण०--जशी आज्ञा. [लक्ष्मणादिकांसह जातो.]
राम०--मारुता, आतां तू—
मारुती०--आतां सीतामातेला घेऊन येतों.
राम०--थांब अशी उतावळी करूं नकोस. सांप्रत दशकंठ रावणाचा वध करून, आपण तेहतीस कोटी देवदानवांची त्याच्या बंदीशाळेंतून मुक्तता केली आहे; तथापि ज्याअर्थी लंकेचं राज्य बिभीषणाला आपणच अर्पण केलं आहे त्याअर्थी लंकापती बिभीषणाच्या सल्ल्यावांचून आपल्याला या कामांत कांहीएक करतां येत नाहीं.
[सुग्रीव प्र. के.]
सुग्रीव०--रघुवीराचा जयजयकार असो. महाराज, सांप्रतचे लंकापती बिभीषणमहाराज यांची राणी सरमा नुकत्याच अशोकवनांत सीतामातोश्रीनां मंगलस्नान घालण्याकरितां सर्व साहित्य घेऊन गेल्या आहेत. आपणहि लवकरच मंगलस्नान करून सीतेला भेटावें अशी लंकापतींनी आपल्याला विनंती केली आहे.
राम०--ठीक आहे. तुम्हीं माझ्या मंगलस्नानाची तयारी करा. मी सर्व वानर सैनिकांची विचारपूस करून लवकरच तिकडे येतो.
[मारुती व सुग्रीव "जशी आज्ञा" म्हणून जातात.]
राम०--(स्व.) त्रिभुवनालाही जर्जर करून आपल्या बाहूबलानं इंद्रब्रह्मादिकांना जिंकणाऱ्या पराक्रमी रावणाला समरांगणांत जरि मी माझ्या वानरसैनिकांच्या सहायानं उलथापालथा लोळवला, तरीपण अशा विजयाच्या आनंदोत्सवांतही माझं मन अझून कां प्रफुल्लीत होत नाहीं कोण जाणें! कदाचित असें असेल—
पद. (घाबरते कां अझुनी.)
तात न माझा अवनी विजय परिसण्यातें ॥ धृ० ॥
दत्यताप सारा हरूनी । धन्य केलि अवधी धरणी।
कोण धरिल हृदयीं प्रेमें रघुवंशजातें ॥ १ ॥
अरुणप्रभा जेंवी रविची। तातप्रीति तनयावरिची।
स्वाद तिचा आतां कैचा मिळे अभाग्यातें ॥ २ ॥
[आतून :-- ``अहो अरण्यपंडीत, जरा थांबा--जरा थांबा. असे एखाद्या नंदी बैलाप्रमाण हुरळून काय जातां? लढाईत विजय कोणाला मिळाला न् तुम्ही नाचतां कोणासाठी? उभे रहा."]
राम०--(स्व.) हे कोणी तरी लंकेंतले रहिवाशी प्रस्तुतच्या युद्धक्रांतीबद्दल कांही तरी बोलत येताहेत. यांचें हें भाषण आपण ऐकलंच पाहिजे. [जातो]
[अरण्यपंडीत व अधिकाऱ्या प्र. क.]
अधिकाऱ्या०--[पूर्वोक्त ``अहो अरण्यापंडीत`` इत्यादि म्हणत प्र. क.]
अ० पं०--कायरे बेट्या अधिकाऱ्या, असल्या आनंदोत्सवांत तुझीरे का माझ्या मागं टुरटुर?
अधिकाऱ्या०-- गळ्यांत फुलांचे हार काय घातलेत, त्या ढालीएवढचा पागड्यांत तुरे काय खोंवलेत, हातांत गजरे काय घातलेत! अहो थेरडोपंत, जनाची नाही पण मनाची तरी काहीं लाज? आजचा प्रसंग कोण? काय कोण?
अ० पं०--कसलारे आलाय प्रसंग? आमच्या लंकेत आज राज्याभिषेकाचा केवढा मोठा समारंभ चाललाय नि याला आपले आठवताहेत प्रसंग. अरे बेटा प्रसंगाचे दिवस गेले. आता तर मोठ्या आनंदाचे न् शांततेचे दिवस आले. समजलास का? काय सांगू तुला अधिकाऱ्या, ही लढाई जेव्हां अगदी जोरांत होती तेव्हां तर माझ्या जिवांत जीव मुळींच नव्हता. रावणमहाराजांनीं पोक्त विचार करून अन्नसामुग्रीच्या कोठारावर अस्मादिकाची योजना केल्यामुळं तेथल्या मिष्ट मिष्ट पदार्थांवर यथास्थित हात मारून मढ्यासारखा पडून होतों. पण आतां नाहीं हो मी तसा! आतां काय? जिकडंतिकडं अगदी खाण्यापिण्याची चंगळ उडणार.
अधिकाऱ्या०--मी तर या विभीषणाला मी आपला राजा कधीच समजणार नाहीं. यानीं तर घरभेद्येपणा करून आमच्या रावणमहाराजांचा समूळ विध्वंस केला. आणि तोच हा स्वार्थसाधू आपल्या भावाच्या रक्तांनीं भिजून चिंब झालेल्या सिंहासनावर मोठ्या थाटामाटानं चढत आहे. मला तर हे बिलकुल पसंत नाहीं.
अ० पं०--पसंत नाहीं? पसंत नाही तर जीव दे. अमक्यानं घरभेद केला. तमक्यानं अमकं केलं, यानं त्याचा हा करून याचा हा नाश केला, न् ह्यानं याचें सिंहासन पटकावलं या कोरड्या उठाठेवी तुला हुजऱ्याला न मला खुषमस्कऱ्याला कशाला रे पाहिजेत? तुम्हां आम्हां हांजीहांजी करणाऱ्या लाळघोट्यांना या राज्याच्या उलाढाली काय कामाच्या? वारा वाहील तशी पाठ द्यायची न् डबोलं हाती लागलं का डल्ला न मारायचा हे आपलं काम. रावणमहाराज होते तोंपर्यंत त्यांची हांजी हांजी, आतां बिभीषण लंकापती झाले त्यांची हांजी हांजी. आपल्याला रे काय? रावण मेला तरी त्याचं सुतक नाही नि बिभीषण राज्यावर बसला तरी त्याचा आनंद नाहीं, लंकाबेट रामराज्यांत सामिल होवो नाहीतर आर्यावर्त लंकाराज्याला इनाम मिळो. त्याचं सुखही नाहीं न् दुखःही नाहीं. मग कोणीका राजा होईना, मेलेले रावणमहाराज पिशाच्च होऊन गादीवर बसले तरी आम्हा लाळघोट्यानां त्याचं काय?
अधिकाऱ्या०--थेरड्या, तुझा अन्नदाता रावण त्या मानवी दशरथपुत्रानं समरांगणांत चिरडून टाकला त्याची तुला कांहींच का लाज वाटत नाही?
अ० पं०--वाटून काय करायची? काय कोळून प्यायची आहे? ज्यानां लाज वाटली ते समरांगणांत मरून गेले. मी तसा मूर्ख नाहीं. समजलास? मी आतां साष्टच म्हणतो. तुला राग आला तर येईना बिचारा. काय रे? रावणराज्यांत एवढी काय नीति रडत होती? जिकडं पहावं तिकडं तुझ्यासारखे हलक्या दर्जाचे दूतसुद्धां उर्मट व मगरूर! त्या दिवशींचा चाबकाचा फटका हा थेरडा कांहीं विसरला नाहीं हो? असली ही ठोकाठोकीची नीती नाहींशी झाली हेंच बरं!
अधिकाऱ्या०--बरं बरं. इतका शेफारून जाऊं नकोस थेरड्या. पाहू आता त्या रामाची न् त्या बिभीषणाची नीति काय ध्वजा लावते ती. रावणमहाराजानीं सहासात महिने आपल्या राणीवसांत ठेऊन घेतलेली आपली बायको बिनदिक्कत कोणताही संशय न घेता पुन्हा पत्करणारा राम कितीसा नीतीचा पुतळा आहे तें दिसतंच आहे. मीतर या गोष्टीबद्दल सर्व लंकेंत-नव्हे सर्व जगभर-डंका पिटल्याशिवाय खास रहाणार नाहीं. (जातो.)
अ० पं०--आणि मी तरि स्वस्थ बसेन वाटतं. आतां राजदरबारात जाऊन ही चहाड़ी चांगली यथास्थित फुगवून बिभीषण महाराजांना सांगतो न् पहस्थ प्रधानजीची खाली झालेली प्रधानकीची जागा पटकावतो. [जातो.]
[राम प्र. क.]
राम०--(स्व.) जन त्रिविध म्हणतात तें कांहीं खोटं नाहीं. या दोघांच्या भाषणानं माझा आनंद पार मावळून गेला. दशकंठाशी घोर युद्धप्रसंग करतांना सर्व ब्रह्मांडाचा एका क्षणांत नायनाट करणाऱ्या अनेक प्रखरास्त्राची मला त्यावेळीं क्षिती वाटली नाहीं; अनलास्त्र, पर्जन्यास्त्र, वज्रास्त्र अशा अगणित दारूण अस्त्रांनां मी सहज लीलेनं पार उडवून देत होतो; ज्या माझ्या धनुर्शक्तीनं रावणासारखा बलाढ्य योद्धा एका निमिषार्धांत मातीला मिळविला तीच माझी युद्धतीला न् धनुर्शक्ती या जनसमुहाच्या वाक्प्रहारापुढें पार बोंथट होऊन गेली. शत्रूच्या अनलास्त्रानं जळून खाक होणं पत्करलं परंतु समाजाचं हे तीक्ष्ण दोषास्त्र पत्करणं फार कठीण. सद्धर्माच्या स्थापनेकरितां, सत्याचा रक्षणाकरितां, न् उन्मत्त राक्षसांपासून भूमीला झालेला असह्य ताप छेदण्याकरितां मी इतका दारूण संग्राम करून लंकेच्या समरदेवतेला राक्षसांच्या रक्तांनीं भिजवून शांत केली, ती याच दोषाकरितां काय? सहस्त्रमुखी शेषाच्याहि वर सरशी करणाऱ्या या अनंतमुखी समाजाला माझी प्रियतमा अखेरीस बळी पडणारसें दिसते. बिभीषणाचं सत्यत्व निष्कलंक राखण्यासाठी न् माझ्या रघुवंशाचं नीतीचं ब्रीद प्रज्वलीत ठेवण्यासाठीं--प्रिये, सीते--मला तुझा अझूनहि त्याग करावा लागणार! हरहर!
पद. [कौन रिझायन] असावरी--त्रिवट.
मति कुंठित होउनि जाई ही अघटीत कर्मगति
सुपथ त्यजुनि मज नेत विरहिं सति त्यागुनीया ॥ धृ० ॥
प्रेमश्रृंखला तुटतां विरही सहचरिवांचुनि राहुं
जगतीं या केंवि श्रमाया ॥ १ ॥
(जातो.)
प्रवेश ६ वा
स्थळ : अशोकवन
पात्रें : सीता व त्रिजटा
त्रिजटा०--सीताबाई तुम्हांला आज मंगलस्नात झालेली पाहून मला आनंद होत
आहे. कारण असं पहा—
पद. (काहेकुं दिने सैंया०)
स्फूर्ति सकल स्थलिं पातली ।
मनि आनंद होई ॥धृ०॥
खगगण उडति स्वरचि अंबरीं ।
गुणगुण प्रभुगुण गाति ते ॥ १ ॥
तरुवर डुलती विजयानंदें ।
सुमन-वृष्टि करितात ते ॥ २ ॥
रघु-रवि तेजें भूषित करि मही ।
अधर्म-तम झणि नाशलें ॥ ३ ॥
--आतां तुमची आणि रामाची भेट झालेली एकदां पाहिली की डोळ्यांचंच नव्हे तर जन्माचं सार्थक झालं असंच मी समजेनं.
सीता०--त्रिजटे, तूं म्हणतोस तसा मलाहि आनंद होऊन आज जिकडे तिकडे आनंदी आनंद दिसत आहे. पहा—
पद (पुष्प राग०)
मुक्त जनांस आनंदवी स्फूर्ती ही मधु विजयरवा जन
काढितसे ॥ प्रेमळ अंतर अखिल जिवांचे प्रभुवर ।
लीला गातसे ॥ धृ०॥ बंधमुक्त त्या दानव देवा
पंचभूतांनां हर्ष भरे । विजयरंगिं से सद्धर्माच्या
गुंगचि दिसती प्रेमरसें ॥ १ ॥
-परंतु श्रीरामदर्शन होऊन त्यांनी माझा स्वीकारच केला नाहीं तर माझी काय स्थिती होईल?
पद. (शामरे मोरी०)
वल्लिगे जशि तरूविना ती । पतिविना ती होय
युवती॥ धृ०॥ भानुविना महिं तेज न पावे ।
वसंत नच सुमनां नं स्फूर्ती ॥ १ ॥
-असेल विचार अझूनहि माझ्या मनांत घोळत आहेत.
त्रिजटा०--अं! त्याची आपण काळजीच करू नये. परिसापासून आणि अमृतापासून कधीं अपाय कां होतो? त्याप्रमाणं श्रीरामचंद्राचा स्पर्श या अशोकवनाला झाला पुरे कीं सुर्योदयाबरोबर अंध:कार जसा नष्ट होतो तसंच या दुष्ट विचारांची रक्षा झालीच समजा. अहाहा! हा प्रातःकाळचा समय आणि हा रामदर्शनाचा शुभसमय पाहून मला असं वाटतं.
पद (यह बदिमे पायो०)
हा पवित्र प्रातःकाळ । मंगल काल । ही प्राचिदिशा
सुविशाल । सजलिसे कुंकुम लावुनि लाल ॥ ही
झांकि निचे द्वय गाल । धुक्याची शाल। तिज दूर
सारूनी चुंबनरत दिक्पती पाहि वधुभाल ॥
नभिं भास्कर उदया येतो।
हा प्राचिदिशापति गमतो ।
नववधू स्वागता घेतो ।
गुंफुनी किरणपुष्पांस । हार नाथास । अर्पि वधु छान ॥ १ ॥
--तो पहा मारुतीच इकडं येत आहे.
मारुती०--(प्र० क०) माते, या हनुमंतावर तुझी कृपादृष्टी असावी.
[नमस्कार करतो.]
सीता०--पद. (छब दिखला०)
उठि झणिं या देई दर्शन मातें रामपदांकित वायुसुता ॥ धृ०॥
विजयध्वजा रणी फडकवुनीया । यशवंतचि
तो रामसखा । मज भेटे कधीं त्वरितहि सांगे ॥
रामपदांकित० ॥ १ ॥
मारुती०--माते, श्रीराम आपल्या भेटीकरितां इकडंच येत आहेत हें सुचविण्याकरितांच मी इकडं आलो, लक्ष्मणानं बिभीषणाला लंकेच्या गादीवर स्थापन केलं आणि त्यासंबंधानं तिकडं मोठा सोहळा चालला आहे. आतां या आमच्या त्रिजटाबाई राजकन्या झाल्या बरं.
त्रिजटा०--मारूती, सत्याचाच नेहमीं विजय होत असतो.
सीता०--तरिरपण इच्छित वस्तुलाभाचा काळ जसजसा जवळ येतो. तसतसा आनंद तर होतोच, परंतु त्या आनंदाच्या इतक्या कांही जोरानं वाढूं लागतात की त्यामुळे मनोविकारांना या असा होऊन हें हृदय कोसळून पडतं की काय, असं वाटतं.
[राम प्रवेश करतो. मारुती जातो]
राम०--सीते—
त्रिजटा०-- अगबाई श्रीराम आले वाटतं?
सीता०--प्राणनाथ-- [त्यास मिठी मारते.]
राम०--(स्व.) अरेरे! या सहा महिन्यांत माझ्या प्रियेची काय ही दुर्दशा झाली! बरोबरच आहे--
पद. (म्यां लोटिली०)
या निटिलीं लिखित जें । टळत न तें भोगिल्याविणें
जगिं भोगिति दानव देव जे ॥ धृ०॥
पराक्रमी ते नवग्रह सारे । शनि मंगल क्रौर्या
वरणारे । दास्यबंधनीं पडुनी बिचारे | साहति
तापा शूर जे ॥ १ ॥
-- (उ०) प्रिये सीते! --अरे पण ही शुद्धींतच नाहीं वाटतं? सीते-सीते जागृत हो.
सीता०--मी स्वप्नात तर नाहीं ना? छे: हें स्वप्नच आहे.
राम०--(स्व०) लोकापवादासाठीं मला अभाग्याला हिचा अझून त्याग करावा लागणार! काय होईल तें होवो. (उ.) प्रिये जानकी, हें स्वप्न नव्हे.
सीता०--प्रियकरा—
पद. (आज मैं लढुंगी०)
आज विरह लोपला । धन्य धन्य जनन होई ॥ धृ० ॥
सुखसेवन दुःखांतीं हर्ष मना देई ॥
प्रगट करी सुखमाधुरी
मधुर लाभ लाभला ॥ १ ॥
आता तरी ही पुनर्भेट अक्षयिंची असो. [मिठी मारण्यास जाते तोंच राम रागानें तिला प्रतिकार करतो.]
राम०--हां! दूर हो. तुला फक्त एकच आलिंगनाचा अधिकार होता. तो तूं भोगलास. आतां इतःपर माझी आशा सोड.
सीता०--[ घाबरून ] म्हणजे?
राम०--तूं आपला पुढचा विचार तुंच पहा. मला तुझी बिलकूल जरूर नाहीं. तुला असुरांनी नेली हा अपवाद टाळण्यासाठी मी एवढा युद्धप्रसंग करून दशकंठाला ठार मारलं.
त्रिजटा०--पण रामा, त्यांत सीताबाईचा असा अपराध कोणता?
राम०--तें मला कांहींच सांगता यायचं नाहीं.
सीता०--हा फुटक्या नशिबाचे सीते, तुझं दुर्दैव तुला अझून छळणार खास!
पद. (मी समजुं तरी०)
हें अघटितचि कायघडे जनिं ॥
प्रियकर नाथा भेटायातें अननुभवी ये संकट
दिसुनी ॥ धृ० ॥ अमृत-कलशीं मुख लावावें ॥
त्क्षणिंक अमृत विषमय व्हावें ॥ स्वकिय गुणा
परिसें त्यागावें ॥ त्यापरि मम पति सति त्यागोनी ॥ १ ॥
-नाथा रामचंद्रा, हा काय माझ्यावर गहजब?
पद. (हजारा मेरा०)
प्रणयि मम पारखी होता ॥ धृ० ॥
अर्धांगीला विरहीं अशि कां छळितां ॥ १ ॥
कृतापराधा जावें विसरूनि आतां ॥ २॥
राम०--तुझ्या पावित्र्याबद्दल माझी आणि सर्व जगाची खात्री कशी पटावी?
सीता०--हाय! [बेशुद्ध पडते.]
त्रिजटा०--महाराज आपण सूज्ञ, त्रिकालज्ञ आणि प्रत्यक्ष परमेश्वरांश असून काय ही आपली विपरीत कृती. सीताबाईंच्या पावित्र्याबद्दल सामान्य जनानी संशय घ्यायचा म्हटलं म्हणजे अंती नरकाचीच प्राप्ती. आतां तो संशय आपणच घेतला म्हणूनच शोभतंय. परंतु सीताबाईची योग्यता मी तरि पूर्ण जाणून आहें. अहो-
पद. (जरा ठाडे रहो०)
पावित्र्यहि यांचे लाजवी भगिरथजा जानव्ही ॥ धृ० ॥
रवि लपवितसे निजवदना । पाहुनि ही पुनितचि ललना ॥
तत्प्रताप पतिव्रत राखण्या चपलेला दीपवी ॥ १ ॥
तव वच नच, वन्हि गमतसे । दृढनिश्चय वज्र वधितसे ।
निष्कारण ही अबला सती पतिप्रणया दाखवी ॥ २॥
[सीतेला सावध करून उठवितो.]
राम०-- मला या नीतिवादाची जरूर नाहीं.
सीता०--प्राणनाथ--
पद. (वहतेरा समजायोरी० ) भैरवी,
ललनेतें अवमानोनी या समया ॥
कुमतीला मनीं वरिली कां या समया ॥ धृ० ॥
प्रणय-भंगा या शोभत नाहीं ॥ १ ॥
उचित खचित नच घातक हा अंकुर त्या ॥ १ ॥
त्रिजटा०--दयेची व आपली गांठ पडते कां?
राम०--हिनं आपलं पावित्र्य सिद्ध करावं आणि मग माझ्या स्पर्शसुखाची अपेक्षा करावी. खरी पतिव्रता अग्नींत प्रवेश करून आपलं पावित्र्य सिद्ध करीत असते.
त्रिजटा०--तेंच आपण सीताबाईंना करायला सांगतां की काय?
राम०--सूज्ञाला एकच शब्द पुरे असतो.
सीता०-- (त्वेषानें) इंतकंच ना? प्रख्यात धनुर्धराच्या पत्नीला हें कांहींच अवघड नाहीं. कारण-
पद. (काय तुझी निष्ठुरता०)
धन्य वंश मम श्वशुराचा गाजतो त्रिलोकीं ॥ धृ० ॥
दैत्यताप सारा हरूनी अश्वमेध केले ॥
रामरायजाया तेजा त्यजि न कधिं विलोकी ॥ १॥
थोर जनक नृपतीकन्या धरणि धन्य माता ॥
काय सिद्ध न करी मजला वन्हि पाहूं दे कीं ॥ २ ॥
त्रिजटा०--सत्याचा जय झाल्याशिवाय कधींहि राहणार नाही.
राम०--मग त्या गोष्टीला उशीर कशाला? हें पहा—
पद. (अनुवैरी भोर की०) भैरवी-त्रिवट.
प्रखराग्नी चेतवी क्षणीं या दाबूनि तेजा
अर्पण करि तव देह झणिं जगिं पावन जो त्यातें ॥ धृ० ॥
निंद्य न होइं पथ धिःकारूनि हा वंद्य करि जनिं
ब्रीदा। रघुवंश जें भुषवि त्याला || सांप्रत स्वीकरि त्यातें || १||
[ अग्नी प्रदिप्त होतो. ]
सीता०--हे अग्निनाराणा—
पद (मुक्त दिशा ज्याला०)
अर्पितसे काया । विमला । ख्यात पुनित पाया ॥ धृ० ॥
ज्वालोदरिं घे नत कन्येला सिद्ध करी या सतिसत्वाला ॥
संभ्रम करि वांया ॥ १ ॥
-श्रीरामा, मी येत्ये बरं, माझं स्मरण तरि करा इतकी विनंती--[ त्रिजटा मूर्छित पडते.]
[ सीता अग्निकुंडात उडी टाकते ]
मारुती०--(शोकाकुल प्र. क.) हाय हाय! रामा हें तूं काय केलंस? सीताशुद्धीचा शेवट असा विषमय कसा केलास? राम राम! काय हा घोर प्रसंग!
पद. (चिंति मन हें०)
हाय! विष हें निघत कैसें कल्पवृक्षापासुनी ॥
अमृतानें मृत्यु कसा? दिसत विपरित या जनीं ॥ धृ० ॥
जानकी ही आदिमाया विश्वपालक राम हा ॥
नष्ट होता माय तुटला विश्वस्तंभचि या क्षणी ॥ १ ॥
--सीताबाई, या बालकालाहि आपण विसरलात ना? विजयी झालेल्या रामसेवकांनी आपणाला पुरतें पाहिलें दिखिल नाहीं. त्यांच्या दर्शनाची इच्छा आतां कोण पुरी करणार?
राम०--(स्व ) अरे पण हा काय चमत्कार!
पद. (मन या मोहें०)
धरणी कांपे थरथर कां ही? भंगोनि गेली ॥ धृ० ॥
प्रलयकाल हा वाटे आला । सप्तजलधिगण काढूं लागला ॥
डळमळते हें अंबर पडती तारका खालीं ॥ १ ॥
[भयंकर आवाज होतो. श्वेत वस्त्र नेसलेलीं सीता अग्नींतून वर येते. त्रिजटा उठते.]
त्रिजटा०--महाराज, या पहा सीताबाई अग्नींतून वर आल्या. आतां तरि त्यांच्या पावित्र्याबद्दल, खात्री पटली कां?
[लक्ष्मण, बिभीषण वगैरे सर्व रामभक्त जयघोष करित प्र. क. राम सीतेला कुंडातून
बाहेर आणतो.)
सर्व रामभक्त०--जय जय रघुवीर समर्थ.
राम०-- प्रिय सीते—
साकी.
संभ्रम तम हे नष्ट पावले सत्वरवी उदयाला ॥
अग्निसिद्ध हा आता म्हणुनी मन्मन वरि हर्षाला ॥
न धरी रोष मनीं । रमरुनी निष्ठुर ती वाणी ॥ १ ॥
सीता०--प्राणनाथा, घडून आलेल्या प्रकाराबद्दल कोणालाहि दोष देता येत नाहीं.
पण रघुवंशाचं प्रज्वलीत सत्य सिद्ध करून दाखविण्याची संधी मला मिळाली याबदल मला फार आनंद होत आहे. त्रिजटे, आता तुझ्या मनाप्रमाणं झालं ना?
त्रिजटा०--सीताबाई, मला अत्यानंदामुळं कांहींच बोलवत नाही. माझ्या डोळ्यांतील हे आनंदाश्रुच तुम्हाला सर्व काहीं सांगतील.
बिभीषण०--हे पहा--
पद. (प्रिये पहा०)
सुरेश्वरा मोद भरे म्हणुनि करिति पुष्पवृष्टिला ॥ धृ० ॥
देव सकल गगनिं जमुनि । गाति अप्सरा सुगानिं
रघुकुल गुण आळवोनि । वदति वचन मंगला ॥ १ ॥
बंधमुक्त देव सर्व । ऋषिजन विरंचि सूर्य ।
आशिर्वच दृष्टि वरुन । करिति पूर्ण मंगला ॥ २ ॥
[सर्व राम-सीतेचे दर्शन घेतात.]
बिभीषण०-- माते आम्हां सर्व रामभक्तांना तुझा पूर्ण आशीर्वाद असावा.
सीता०-- तुम्ही माझ्या मुक्ततेसाठीं जे अश्रांत श्रम केलेत त्यांची भी उतराई कशी होणार कोण जाणे? तरी पण—
॥ भैरवी ठुंबरी. ॥
राज्यासनीं चिर दिगंत या विभवा सेवा ॥
जनिं अनुपम ती सुविमला श्री मिळवा ॥ धृ०॥
रवि शशि गगनी या जोंवरि विहरति हे ॥
सौख्या सेवा जा तरुनीया या भवा ॥ १ ॥
राम०-- भक्तजनहो, सीताशुद्धीचा शेवट असा गोड मंगलकारक झाल्याने केवळ तुम्हालाच नव्हे, तर पृथ्वीच्या पाठीवर सत्याचे आणि सद्धर्माचे जितके भोक्ते आणि पुरस्कर्ते आहेत, तितक्यानांहि आनंद झाल्याविना राहणार नाहीं. हे आपलं चरित्र-नाटक इतक्या अनेक नीतितत्त्वांनां परिषूरित झालं आहे किं सात्विक वृत्तीनं सद्धर्माची कांस धरून जगांत वर्तन करणाऱ्यांना सद्गति कशी मिळते आणि तमोगुणाचा स्वीकार करून उन्मत्तपणानं गोब्राह्मणांचा छळ करणाऱ्या राक्षसांची दुर्दशा कशी होते हें सर्व जगाला याच सीता-शुद्धी नाटकांत पहावयास मिळेल. त्रिजटे, मी सीतेला-इतकी निर्दयता कां दाखविली याचं तत्त्व तुझ्या लक्षांत आतां आलंना? तूं माझ्याठायीं जी भक्ती केलीस आणि या माझ्या लाडकीचा अशोकवनांत जो सांभाळ केलास तो पाहून मी संतुष्ट झालों. तुला वाटेल तो आशीर्वाद मागून घे मी तो फार संतोषानं देईन.
त्रिजटा०--देणं असेल तर हें द्यावं.
पद.--(या विरहा०)
नृपतिमनीं नय राहो । रामा ॥ धृ० ॥
प्रजापालनीं तनयजननिचें प्रेम जनीं जन पाहो ॥ १ ॥
सांप्रतच्या नृपशिरीं चिरायु नृपवैभव तें राहो ॥ २ ॥
राम०--तथास्तु भक्तजनहो, आतां माझं हें वचन पूर्ण ध्यानांत ठेवा—
पद - (दत्त गुरु दत्त गुरू०)
संभवे युगींयुगिं धर्म तारावया साधुपरिपालनीं वचन मम सत्य हें ॥ धृ० ॥
धर्मास ये ग्लानि, सत्यास जैं हानि। साधुजन पीडनीं । तारणीं मीच ये ॥
छेदावया समुळ । कुमति-तरु-मूल खल । स्थापावया
अचल-। सत्य, मी अवतरे ॥ १ ॥
भक्त मज गात कुणी । स्मरुनि मम तेज जनिं धांवुनी त्याच क्षणिं ।
उद्धरिन त्या स्वयें ॥ २ ॥
भरतवाक्य.
चाल.-- बँडची.
उगवो विभव-रवी । भरतभूवरीं । झणिं द्वैत लया।
जाऊनिया । ऐक्य होऊनि ॥ धृ० ॥
स्वधर्मं-पालनीं । नित रति वसो जनीं ।
मनिं मातृभूमिभक्ति अचल सतत बाणुनि ॥ १ ॥
कधिं जनमति न चळो । निज ध्येय नच ढळो ।
अघसंगरिं जननायक धृति तिळ न ती पळो ॥ २ ॥
नृप न्याय देवता । समप्रेम दावितां ।
जनप्रेम नृपतिवरति सतत राहुं वर्धनीं ॥ ३ ॥
अंक पांचवा समाप्त.
श्रीसीतारामचरणार्पणमस्तु.
-----------------------------