रायगड : यात्रा, दर्शन, माहिती
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
जय महाराष्ट्र
महाराष्ट्राचा परमेश्वर छत्रपति श्रीशिवरायाची
राजधानी नि समाधिस्थान
रायगड
यात्रा – दर्शन – माहिती
लेखक
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे
किंमत १ रू
प्रकाशक
सत्यभागाबाई पांडुरंग,
निर्णयसागर प्रेस,
२६-२८, कोलभाट स्ट्रीट, मुंबई २
मुद्रक
रामचंद्र येसू शेडगे,
निर्णयसागर प्रेस,
२६-२८, कोलभाट स्ट्रीट, मुंबई २
प्रकाशन तारीख
१७ जून १९५१
श्री शिवराज्याभिषेक दिन
रायगडची यात्रा
जसा पंढरीमध्यें भुकेला भक्तीचा तो विठुराया ।
तसाच रायगडीं तान्हेला शक्तीचा श्री शिवराया ।।
-कवि सोपानदेव चौधरी.
प्रासदो जगदीश्र्वरस्य जगतामानन्ददोsनुज्ञया
श्रीमच्छत्रपते: शिवस्य नृपते: सिंहासने तिष्ठत:
शाके षण्णव-बाण-भूमिगणनादानन्दसंवत्सरे
ज्योतीराजमुहूर्तकीर्तिमहिते शुक्केशसार्पे तिथौ ।। १ ।।
वापी-कूप-तडाग-राजि-रुचिरं रम्यं वनं वीतिके
स्तंभै: कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहैर्मीहिते ( ?)
श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो
यावच्चंद्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ।। २ ।।
- रायगडावरील श्रीशिवरायाच्या समाधीनजिक असलेल्या जगदीश्र्वराच्या मंदीराच्या महाद्वाराच्या आत शिरताना डाव्या बाजूच्या सुमारे १।। हात लांब नि १।। हात रुंदीच्या
चि-यावर कोरलेले दोन संस्कृत श्लोक.
भारतात जन्म यायला पुण्याई लागते म्हणतात. पण त्यापेक्षा म-हाठदेशातल्या जन्माच्या पुण्याईचे माहात्म्य फार थोर. म-हाठदेशीं माझा जन्म. केवढे भाग्य माझे ! पण जिवाला एक रुखरुख लागलेली होती.
तीनशे वर्षांपूर्वीचा चिरस्मरणीय मुकाबला. सारी दक्खन म्लेंच्छाक्रांत झालेली. हिंदुत्व शिल्लक उरण्याचाहि भरवसा दिसेना. हिंदुमात्र म्हणजे केरपाचोरा. त्याने केवळ जबरदस्तांच्या पखाली वहाव्या. असा काळदण्ड उभ्या भरतखंडात जारी. विंध्याद्रीच्या उत्तरेकडचा भारत मोगल बादशहीच्या भजनपूजनात गर्क . हिंदुजनांचे सत्व नि सत्वच मातीमोल झालेले. त्याना स्वराज्य कसले ? अशा आणीबाणीच्या कालखण्डात ज्या पुरुषोत्तमाने
हिन्दवी स्वराज्य-स्थापनेचा कर्णा फुंकला ,
सह्याद्रीची रानवट दरीखोरी स्वयंनिर्णयाच्या नि स्वदेश-स्वातंत्र्याच्या अपूर्व संदेशाने थरारवून हालती बोलती नि लढती केली आणि लोकोत्तर चातुर्याने म्लेंच्छ सत्तेचे निर्दाळण करून, रायगडावर हिंदुपदपातशाहीचा भगवा झेण्डा फडकवला, त्या महाराष्ट्राच्या परमेश्वराच्या-छत्रपति श्रीशिवरायाच्या -समाधीवर मस्तक घासावे , ही माझी फार वर्षांची मनीषा. जिवाला तळमळ लागली होती सारखी . शिवरायाच्या समाधीचे दर्शन नाही, त्या पुण्यश्र्लोकाने पायदळी पावन केलेल्या रायगडाची धूळहि कपाळी लागत नाही, कशाला जन्माला आलो मी महाराष्ट्रात ?
यापूर्वी एक दोन आले होते पण ते साधले नाहीत. आता तर ( सन 1949 ) साठी उलटून पासष्टी चालू झाली. स्नेहीजन म्हणत "आता कसचे रायगडाचे आरोहण तुम्हाला जमणार ? डालग्यात बसून मजूरांच्या खांद्यावरच वर जावे लागेल तुम्हाला." विनोदाने पण अंतरीच्या निर्धाराने मी म्हणायला की "छे बुवा, मेल्याशिवाय कोणाच्याहि खांद्यावरून कोठेही जाणार नाही. जाईन तर एका दमात पायी चालून महाराजांच्या समाधीपर्यन्त गडावर जाणार हा निश्र्चय". शिवरायांच्या कृपेने तो यथासांग पार पडला. त्याची कथा सविस्तर सांगतो.
माझा रायगड यात्रेचा निश्र्चय ठरायचा अवकाश, भराभर जिव्हाळ्याच्या शिवप्रेमी स्नेहीजनांचे वर्तुळ माझ्याभोवती जमू लागले. सन 1949 च्या नाताळाच्या सुट्टीचा मुहूर्त नक्की केला. महाडचे लोकप्रिय पुढारी स्नेही महाशय सुरेन्दनाथ गोविंद उर्फ सुरबा टिपणीस यांच्याकडे कार्यक्रमाचा खलिता रवाना झाला. यात्रेच्या सर्व सांगतेची किल्लेदारी त्यांच्यावर सोपवली.
वरोवरचे यात्रेकरू स्नेहीमंडळ.
चंद्रकला चित्र या बोलपट संस्थेचे स्वावलंबी चालक , सुप्रसिद्ध स्टिल फोटोग्राफर नि सिने-डायरेक्टर महाशय चंदशेखर हे दत्ता वैद्य आणि भाई भगत या दोन मदतनिसांसह सबंध रायगडाचे चलचित्रीकरण करण्यासाठी सिने - कॅमेरे वगैरे साहित्य घेऊन यात्रेकरूंत सामील झाले. जर्मनीतील विख्यात पाठशाळांच्या सिने-तंत्रपटु पदव्या पटकवणारे विख्यात सिनेडायरेक्टर महाशय कुमारसेन समर्थ बरोबर निघाले. नासिकचे महाराष्ट्रख्यात कविराज सोपानदेव चौधरी आपली कंठाळी खांद्यावर टाकून धावले. दादर कविमंडळाचे रसिक सदस्य लक्ष्मणराव सुळे ऊर्फ कवि ` विपिनसुरेंद्र गोविंद टिपणीस. विहारी `, रानडे रोड रहिवाशी संघाचे कार्यकर्ते महाशय रा. वा. कर्णिक, चंद्रकांत मुलेसकर वगैरे दहा बारा मंडळी उत्साहाने माझ्याबरोबर निघाली. रायगडावरील शिवरायाच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे नवे बांधकाम पुरे करणा-या दिवंगत तात्यासाहेब सुळे इंजिनियरांची कनिष्ठ कन्या कुमारी सिंधू सुळे मुद्दाम निघाली .
स्टेट ट्रान्सपोर्टचा प्रवास.
काही वर्षांपूर्वी मुंबईहून महाड ते रायगडचा प्रवास फारच त्रासाचा होतो. मुंबईहून आगबोटीने निघायचे,घरमतरला उतरायचे, तेथून पडावाने पेणला जायचे, तेथे बैलगाड्या भाड्याने करून महाडला जायचे, असा किचकट त्रिस्थळी यात्रेचा होता. आता, मुंबईहून थेट महाडला बस सर्विस चालू आहे. दि. २४ डिसेम्बर १९४९ शनिवारी पहाटे मुंबईहून निघणा-या स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसने साडेसहा बाजता, ` छत्रपति शिवाजी महाराजकी जय, जय महाराष्ट्र ` या गर्जना करीत आम्ही रायगड यात्रेकरू निघाले. सुकेळी खुंडीपर्यन्त प्रवास छान झाला. खिंड चढताना आमची बस पुढे जायला टंगळमंगळ करू लागली. तिने आपला वेगहि गोगलगाईचा केला. ड्रायव्हरजीनी दीडफूट लांब सुस्कारा टाकला. तो हात जोडून स्वस्थ बसला. यंत्रात कोठे काही बिघाड झाल्यास तो पाहण्याचा ड्रायव्हरला अधिकार नव्हता ; ते काम फक्त स्टे. ट्रा. च्या खास विंजणेराचे. तो येईल तेव्हा पुढची बसची नि आम्हा प्रवाशांची वारलाद लागयाची, असा पडला कंपनीचा कायदा. वरसगांवला बसबाईने अखेर बैठकच मारली. सगळे उतारू खाली उतरले. आमचे नशिब थोर. थोड्याच वेळात मुंबईकडच्या आणखी बसगाड्या आल्या. त्यांत दोनदोन चारचार उतारूंची वाटणी होऊन आम्ही पुढे मार्गाला लागलो नि सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास महाड येथे टिपणिसांच्या घरी येऊन दाखल झालो. स्नाने उरकून सर्वानी मेजवानी झोडली. वामकुक्षीचा विचार डोक्यात डोकावतो तोच टिपणीस कपतानजीचे फर्मान सुटले कीं
`` रात्रीचा मुक्काम करायला तात्काळ पाचाडला निघालेच पाहिजे.`` झाले. स्पेशल बस दारात येऊन तिने
चलो भैया, आगे कूच करना है
असा कर्णा फुंकला. इतक्यात माझ्या निमंत्रणाला मान देऊन महाडचे इतिहास-संशोधक स्नेही महाशय आवळसकर मास्तर आमच्या टोळीत सामील झाले. संध्याकाळी 5 वाजता आम्ही पाचाडला जाण्यासाठी निघालो. 12 मैलांवर कोंझर गावानजिकच्या एका शेतात आम्हाला उतरवून बसगाडी महाडला परत गेली. आमच्या यात्रेचे टिपणिसांचे फर्मान आधीच पुढे गेलेले असल्यामुळे, पाचाडच्या महार बांधवानी कोंझरला 7-8 ओझेकरी उभेच ठेवले होते. त्यानी भराभर आमची सामानांची ओझी डोईवर घेऊन चालायला सुरुवात केली.
पाचाडची डोंगराळ पायपिटी.
कोंझरपासून पाचाडचा डोंगरी चढाव सरासरी दोन मैलांची आहे. असे म्हणतात की ` कोणे एके काळी ` महाडच्या डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाने कोंझर ते पाचाडपर्यन्त गाडीरस्ता बांधला होता. पण शिवरायाच्या रायगड राजधानीची किती शोचनीय अवस्था झालेली आहे ,हे पायथ्याशीच प्रवाशांच्या स्वच्छ अटकळीत यावे, म्हणून त्या रस्त्यानेहि तशीच उध्वस्त प्रेतकळा पत्करण्याचा आत्मयज्ञ राजखुषीने नि अक्कलहुशारीने केला आहे. रायगडची खरी डोंगर-चढाई वास्तविक कोंझरपासूनच सुरू होते म्हणायला काही हरकत नाही. हातात उंच भक्कम काठीचा आधार घेऊन, चढावाच्या वाकड्या तिकड्या दगड धोंडे खडकांच्या दरडीवरून मुत्सद्दी चातुर्याच्या एकेक पावलाने मार्ग कंठावा वागतो . त्या लत्त्यातील रहिवाशांना त्याचे काहीच वाटत नाही. झपाझप पावले टाकीत रात्रंदिवस ते जात येत असतात. सूर्यास्त झाल्यानंततर मात्र चांगल्या लांब पल्ल्याच्या तेजाळ बिजलीबत्ती (टॉर्च) शिवाय वाटेचा सुगावा काढणे फार कठीण कर्म.
शिवकाली पाचाड मोठ्या बाजारपेठेचा गाव होता. गडावर येथूनच सर्व प्रकारच्या खाजगी मुलकी नि लष्करी सामान साहित्याचा पुरवठा होत असे. महाराजाना भेटायला येणा-या देशी परदेशी पाहुण्यांची नि मुत्सद्यांची प्रथम छावणी येथेच पडायची आणि प्राथमिक विचीरपूस चौकशी खुलासे झाल्यानंतरच त्यांची गडावर रवानगी व्हायची . माता जीजाबाई नेहमी आजारी असत. त्यांच्यासाठी महाराजानी पाचाडलाच एक मोठा राजवाडा , विहिरी , बाग बांधलेले होते. त्यांचे आज नुसते चौथरे पहायला मिळतात. पाचाडचा चढाव चढत असताना , सूर्यास्ताच्या सोनेरी किरणानी न्हाऊन निघालेला रायगड पहाताच त्याच्या भव्यतेची स्पष्ट कल्पना होते.
महार बांधवांचे प्रेमळ आदरातिथ्य.
सुमारे सायंकाळी साडेआठच्या सुमाराला आम्ही 25 यात्रेकरू ( कारण महाडचे सुरबा टिपणीसादि 10-12 मंडळी आमच्या मार्गदर्शनासाठी बरोबर आले होते.) पाचाडच्या महारवाड्यात येऊन दाखल झालो. आहाहा ! त्या आमच्या महार भगिनीबांधवांची आपुलकी नि जिव्हाळा किती वर्णावा ! शाळेपुढील स्वच्छ सारवलेल्या आंगणात त्यानी रंगीबेरंगी कागदांच्या पताका तोरणे माळा लावून एक प्रशस्त शामियाना आमच्या स्वागतासाठी उभारला होता. हातपाय धुण्यासाठी गरम पाण्याचे हंडे तयार होते. हातपाय धुऊन बैठकीवर बसताच चहा तयार . सर्वानी थोडा फराळ केल्यावर , गप्पागोष्टीबरोबरच
सोपानदेव चौधरींचे सुस्वर काव्यगायन
झाले. पाचाडच्या महारवाड्यात अवचित दिवाळीच साजरी झाली म्हणा ना. रात्री 12 वाजता शालागृहात सगळ्या पांथस्थांच्या पथ-या थाटल्या आणि उदय़िक श्रीशिवरायाच्या स्फूर्तिदायक राजधानीचे नि समाधीचे दर्शन होणार, या गोड आशावादात ` जय महाराष्ट्र ,छत्रपति शिवाजी महाराजकी जय ` या गर्जनात आम्ही निद्रावश झालो.
जय राजगड ! जय महाराष्ट्र !
केवळ ऐतिहासिक स्थळे पहाण्यासाठी जाणारी ट्रिपवाली मंडळी आणि आम्ही, यांच्या भावनेतच एक मूलभेद होता. खरोखररच महाराष्ट्राचे कुलदैवत, आम्हा मऱ्हाठ्यांचा परमेश्वर, छत्रपति शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या दर्शनासाठी निघालेले आम्ही भाविक मनोवृत्तीचे यात्रेकरू होतो.
पहाटे साडेपाच वाजता एकदम ` जय रायगड, जय महाराष्ट्र ` गर्जनांची सरबत्ती झडली आणि आमची उठाऊठ झाली. मुखमार्जनादि विधि उरकून चहापान होताच, उगवत्या सूर्यनारायणाच्या कोवळ्या सुर्यकिरणांची मातृपितृतुल्य गोंजारणी घेत घेत , 7 वाजता आम्ही रायगडाच्या चढणीला लागलो. काठीच्या टेकाने एकेक पाऊल आता दमछाट टाकावे लागत होते. बरोबर सुरबा टिपणीस, चिंतोपंत देशपांडे, आवळसकर मास्तर वगैरे महाडकर मंडळी असल्यामुळे, प्रत्येक चढणीला जागोजागचा इतिहास, आख्यायिका नि दंतकथांची त्यांची रसाळ प्रवचने आमचे चढणीचे आयास हलके करीत होती.
थोड्याच वेळात मंडळींची टोळ्याटोळ्यानी पांगापांग झाली. एक टोळी हजार फूट उंचीच्या कड्यावर, दुसरी थोडी मागे एकाद्या नजरफाट चढावावर. एकमेकाना आपापल्या टप्प्याचा ईषारा देण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या नि जय महाराष्ट्रच्या गर्जनानी रायगडाची दरीखोरी एकसारखी ध्वनिप्रतिध्वनीनी दुमदुमत राहिली. सिंधु सुळेबरोबर आलेल्या दोनतीन मुलींचा नि मुलांचा उत्साह काय सांगावा ?
रायगडचा आजचा चढाव म्हणजे तुम्हा आम्हा
शहरी प्राकृताना दोरीवरची किंवा
बाटलीवरची कसरतच.
पण ती मुले नि मुली हरणासारख्या तडातड उड्या मारीत सगळ्यांच्या आघाडीला धावा घेत चालली होती. समुद्राच्या सपाटीपासून रायगडाचे शिखर अंदाजे ३००० फूट उंचीवर आहे. काही वर्षापूर्वी लोकमान्य टिळकांच्या खटपटीने स्थापन झालेल्या रायग़ड कमिटीने ठिकठिकाणी बांधलेल्या चढावांच्या पाय-यांचे नि तोडी, गडावर सारखी ये जा करणा-या गाईम्हसरांच्या वरदळीने, आज पार निखळुन उध्वस्त पडलेल्या आहेत. कित्येक ठिकाणचे चढाव थेट आपल्या छातीसमोर उभ्या सुळक्यासारखे येत असल्यामुळे,
प्रत्येकाने आपल्या पावलांकडे नीट पाहून चालावे
हा वाडवडलांचा पोक्त ईषारा पावलागणिक आठवत होता. कित्येक जागी तर एका पावलापुरतीच निमुळती पायवाट. उजव्या बाजूला उंच दरड आणि डाव्या बाजूला खोलवर तुटलेला कडा आणि पायथ्याशी नकाशासारखा पसरलेला नयनरम्य भूप्रदेश खेडेगावांचे पुंजके, शेतवाड्या, बगिचे, राया तलावांचे ठिपके आणि सर्वामधून सळसळत वाकडीतिकडी धावणारी एकादी नदी, हा निसर्गाच्या लेखणीने काढलेला भूप्रदेशाचा नकाशा पाहून डोळ्यांची भूक भागवण्याचा मोह वरचेवर होतो. पण चढावाची पावले टाकता टाकता तो मोह भागवण्याचे कर्म मात्र भंयकर. नजर गर्रकन फिरते. चालण्याचे थांबवूनच हा कड्याखालचा देखावा क्षणभर पहावा लागतो. एरवी,
डावीकडे पाहू नका, सरळ चला,
हा वाटाड्याचा कर्कश इशारा इमाने इतबारे मानावाच लागतो. कारण, नजर तरळून पाऊल चुकले का माणूस गेलाच गडगडत खाली वाडवडलांच्या खास भेटीला ! रायगडाचा बहुतेक चढाव एका माणसाचीच पाऊलवाट आहे.
गड - चढणी चालली असताना, इतरांप्रमाणे माझ्याही मनात एकच प्रश्न वरचेवर येत होता. राजधानीचा रायगड. शिवरायाच्या राजाभिषेकप्रसंगी आग्रेज - फ्रेंचादिकांची वकिलात मंडळे व्यापारी, भिक्षुक, कलावंत, पायदळ, घोडेस्वार, नालख्या पालख्या, मेणे, वगैरे लाख दीडलाख जमाव रायगडावर आला नि गेला, तो काय याच छातीफोड नि नजरफाट पायवाटेने ? आज गायर नि म्हसरं या वाटेने जातात येतात. पण हत्ती घोडेस्वार नि सांडणीस्वार कसे काय आले गेले असतील ? निराळाच एकदा प्रशस्त राजमार्ग कोठेतरी असावा काय ? एका दोघाना ही शंका मी विचारली तेव्हा कोणी म्हणे वाडीवरून रस्ता होता, तर दुसरा सांगे वरंघ गावावरून होता, तर तिसरा बिरवाडीचे नाव सांगतो. मला एकहिविधान पटले नाही. गडाच्या अखेरच्या पडझडीत तो रस्ता कायमचा गडप झालेला असावा अथवा मूळच तो कोठेही नसावा.
चीत दरवाजा नि खूप लढा
सुमारे ५०० फूट वर चढल्यानंतर चीत दरवाजा ( खिंडीसारखे एक नुसते वळण ) लागतो. रायगड कमिटीने येथे `चित दरवाजा` अशी पाटी ठोकलेली आहे. येथे चित शब्दाचा संबधच काय मुळी? ते वळणच असे आहे की येईल त्याला चारीमुंडे `चीत ` करता येईल. चित शब्द चूक आहे. येथून पुढे एका उंच टेकाडावर कमिटीने मोठा पत्र्याचा बोर्ड लावून त्यावर रायगडाच्या अखेरीचा संक्षिप्त इतिहास लिहून ठेवलेला आहे. येथूनच पुढे ` खूप लढा ` नावाच्या सूळकाबादज चढणीचा तंगतमोडी रस्ता लागतो. चढणीरांची हा चांगलीच कसोटी पहातो. पुरी दमछाट करावी लागते. आणखी पुढे हजार फूट वर चढल्यावर, रायगडाची काळीकभिन्न चि-यांची विशाळ नि घोटीव तटबंदी दिसताच, गडाच्या भव्यतेने माणसाचे ह्रदय उंचबळू लागते. डोंगराच्या तुटत्या कड्यावर विशाळ नि प्रचंड पाषाणांची ही रेखीव नि घोटीव तटबंदी बांधलीच असेल कशी ? या प्रश्नचिन्हाचे कोडे प्रेक्षकाला क्षणभर तरी बुचकळ्यात टाकटे. जसजसे जवळ जावे तसतसा एकेक प्रंचड चिरा एकेक प्रचंड चिरा एकमेकात कैचीसारखा साखळीबध्द बसवलेला पाहील्यावर, शिवकालीन स्थापत्यशास्त्राचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतात.
महाव्दाराचे दर्शन.
आता समोर डावी उजवीकडून मिळत्या येणा-या अंदाजे 75 फुटी उंचीच्या तटांच्या काळ्याभोर चिरेबंदी भिंती दिसू लागतात. इंग्रेजी S एस अक्षराच्या वळणाने चालत चालत आपण पुढे जातो तोंच समोर भव्य महाव्दाराचे दर्शन घडते. बाजूला दोन उंच नि भव्य बुरूज आणि हा विशाळ कमानदार दरवाजा पहाताच प्रेक्षक अभिमानाने, आश्र्चयाने नि आदराने गहीवरून जाऊन तेथल्या पाय-यांवर साष्टांग नमस्कारच घालतो. निदान माझी तरी तशी अवस्था झाली खरी.
श्रीशिवरायाच्या नि स्वराज्यासाठी
सर्वस्वाचे हासत हासत बलिदान
करणा-या मर्द मावळ्यांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेल्या या पाय-यांची माती कपाळाला लावतो. कोणताहि शत्रू या महाद्वारापर्यन्त कसाबसा टिकाव धरून आलाच, तर अवघे वीस पंचवीस ढालाईत त्याची चटणी उडवायला पुरे, अशीच ही योजना आहे. लाकडी दरवाजे आता कोसळले आहेत आणि पूर्वीच्या औरसचौरस चार फुटी अर्गळेचा एक हातभर तुकडा तेवढा नमुन्याला शिल्लक उरला आहे. दोन बाजूना पुरुषभर उंचीच्या चिरेबंद चौथ-याच्या देवड्या आहेत. शिवाय आतल्या बाजूला दोन पडक्या घरांचे पाये आहेत. प्रत्यक्ष गडावरील वसतीचा नि इमारतींचा आणि या महाद्वाराचा तसा काही संबंधच ठेवलेला नाही. दोघात पुढे अर्धा पाऊण मैल चढावाचे अंतर आहे.
हे अंतर चालून गेल्यावर पठाराच्या सपाटीवर येण्यापूर्वी दोनदोन तीनतीन फूट उंचीच्या लांबलचक १५-१६ पायऱ्या चढाव्या लागतात. रायगड-चढणीच्या तपश्चर्येची ही अखेरची कसोटी. ही पार पडली का आलोच आपण साधारण पठारावर . येथून फर्लांगभर गेल्यावर
मदारशहाची कबर लागते.
तेथे एक ६-७ इंच व्यासाचा नि पुरुषभर उंचीचा मलखांबासारखा लोखंडी खांब पुरलेला आहे. त्यावर शिवाजी कसरत करीत असे, असे काहीजण सांगतात. खांबाच्या माथ्यावर जाड लोखंडी कडी कोयंड्यात अडकवलेली आहे. यावरून तो मलखांब खास नसावा. त्यावर काही मराठी अक्षरे खोदलेली आहेत, पण आता ती वाचताच येत नाहीत इतकी खरचटून नाहीशी झाली आहेत. जवळच या जागेच्या समोर हत्तीचा तलाव आहे. पोहण्यासाठी हत्तीना तेथे सोडीत असत. यावरून मदारशहा हत्तीखान्याचा माहूत असावा. त्याला मागाहून लोकानी पीर बनवला असावा आणि तो लोखंडी खांब हत्ती बांधण्यासाठी असावा, असा सरळ तर्क होतो.
रायगड कमेटीची धर्मशाळा.
रायगड चढायला आम्हाला साडेतीन तास लागले. साडेदहा वाजता आम्ही धर्मशाळेत दाखल झालो. काही वर्षापूर्वी महाशय आठवले यांच्या एकनिष्ट परिश्रमाने रायगडच्या पायवाटेची जी सुधारणा झाली, त्या वेळीं सांगलीचे सुवर्णतुलावाले श्रीमंत विष्णू रामचंद्र वेलणकर यानी 2000 रुपये खर्चून ही धर्मशाळा बांधलेली आहे. येथे चार प्रशस्त खोल्या, प्रत्येकीत एकेक लोखंडी खाट, काही खुर्च्या आणि स्वयंपाकाची भांडीकुंडी अशी सोय केलेली आहे. खुर्च्यांची बसकटे खलास झाली असली, तरी खाटा जेमतेम तग धरुन आहेत. पाठीमागे स्वयंपाकासाठी पत्र्याची एक मोठी शेड बांधलेली आहे. जवळच गंगासागर तलाव असल्यामुळे पाण्याची सोय उत्तमच. येथली व्यवस्था दरमहा 15 रुपये पगारावर पाचाडचा शेडगा नावाचा दाढीवाला बुवा पहात असतो. प्रवासी गड चढू लागले म्हणजे शेडग्याचा माणूस आपणहून पुढे जातो आणि सर्व व्यवस्था ठेवतो. असा त्याचा करार आहे.
पाचाडच्या महार बांधवांकडे स्वयंपाकाची कामगिरी सोपवून, आम्ही न्याहारीच्या खटपटीला लागलो. गडावर धनगरांची वसति आहे. रानटी काट्याकुट्यानी मढवलेल्या त्यांच्या झोपड्या ३-४ ठिकाणी दिसल्या. त्यानी पाळलेल्या गाई म्हशी तमाम गडावर सगळीकडे चरत भटकत असतात. ताजे दूध दही ताक लोणी त्यांच्याकडे मुबलक मिळते. त्यांचा तो व्यापारच आहे. मात्र नवख्या माणसानी त्यांच्याशी व्यवहार करणे फार कठीण जाते. दहीदुधाच्या गाडग्याचे अडीज रुपये सांगून, अखेर खाराखिरीच्या कपाळफोडीने ते अवघ्या १०-१२ आण्यात विकणारी ती धनगर मंडळी (बाया नि बुवा) आपल्या व्यापारात
विद्यमान राजवटप्राप्त चहाचे गुळवणी धोटण्यापेक्षा, मडक्यांत उकळवलेले गरमागरम दूध पोटभर पिऊन न्याहारी केल्यावर, टोळीटोळीने मंडळी गडसंचारासाठी बाहेर पडली. आमच्यापैंकी तिघाचौघाना दुपारीच महाडला परतायचे होते. ते सामाईक न्याहारीची वाट न पहाता आधीच पुढे सटकले.
गंगासागर तलाव
रायगडावर हेच एक दर्शनीय स्थान आता उरले आहे. गडावर लहान मोठी अनेक तळी आहेत. पण गंगासागराइतका पाण्याचा स्वच्छ अखंड नि मुबलक पुरवठा कोठेहि नाही. गंगासागर शिवाजीमहाराजांनी बांधला. त्याला बाराही महिने पाणी असते. माघ महिना उजाडला का बाकीची सारी निर्जल होतात. गंगासागर कातळात उकरलेला आहे. तो 360 फूट लांब नि 300 फूट रुंद आहे. बराच खोल असल्यामुळे तेथे रायगडच्या अखेर क्रांतीत खजिना बुडवल्याची दंतकथा आहे. गंगासागरात स्नान करावे, अशी सगळ्यांची इच्छा होती. पण डिसेम्बर महिन्याचा थंडीचा कडाका होता तो. पाण्यात बोट बुचकळताच अशा काही महि-या आल्या का तो वेत मानसिक स्नानावरच उरकावा लागला. उन्हाळ्यात मात्र गंगासागराचे स्नान आल्हादकारकच असणार, यात संशयच नको.
नागप्पापेठ ऊर्फ बाजारपेठ.
होळीच्या मैदानाला लागूनच ही सरळच दीड फर्लागांची बाजारपेठ पाहिली का मुंबईच्या हॉर्नबी रोडची आठवण होते. तसाच रूंद राजरस्ता. दोनी बाजूना फूटपाथ आणि एकसांची एकरकमी चिरेबंदी दुकानांची रांगच्या रांग. उंच ओट्यावर माल मांडण्याची दर्शनी ओसरी, आतल्या बाजूला साठा आणि त्यामागील खोलीत व्यापा-याने गि-हाइकाशी घाऊक व्यापाराची बोलचाल करण्याची बैठकीची जागा, असा थाट. मावळत्या बाजूच्या दुकानांची पिछाडी पीलखान्याकडे, पण उगवत्या बाजूच्या दुकानांची मागली दारे थेट तुटत्या कड्यावर. नागप्पापेठ पहाताच शिवरायाच्या नगर-रचनेच्या अभिरूचीचे किती कौतुक करावे असे वाटते. सध्या पेठेच्या दुकानांची भयंकरच पडझड झालेली, तरी त्यांचे चिरेबंदी कोरणीचे पाचे आणि भिंताडांचे शिलकी अवशेष पेठेची कल्पना चांगलीच देतात. रायगड कमेटीने या जागेच्या तोंडावर `बाजार पेठ` अशी पाटी मारलेली असली, तरी तिचे मूळ नाव नागप्पा पेठ असेच होते. नागप्पा नावाचा एक प्रसिद्ध पुढारी व्यापारी होता. त्याचे स्मारक म्हणून नागाचे चित्र कोरलेली एक प्रचंड शिळा कोठेतरी असल्याचे आम्हाला समजले. पुष्कळ शोध केला तेव्हा एका काटेरी झुडपाच्या जाळीत ती वाकडी तिकडी पडलेली आढळली. या नागप्पाशेटीचे आडणाव खांडेकर असून त्याचे वंशज छत्रनिजामपूर जवळ एका गावी रहात आहेत.
पेठेच्या तोंडाशीच ` पीलखाना " ( म्हणजे हत्ती बांधण्याची जागा ) अशी पाटी मारलेली चौफेर दगडी भिंताडाची जागा आहे. ती वखारीची जागा असावी. हत्तीखाना बांधण्याचे स्थापत्यतंत्र तेथे मुळीच दिसत नाहीं.
टकमक टेकडी
नागप्पा पेठेचे निरीक्षण करीत करीत मंडळी टकमक टेकडीजवळ आली. सामान्य निरीक्षणाबरोबरच महाशय चंद्रशेखर यांचे चलचित्रलेखनाचे काम सारखे चालूच होते. त्यानी सबंध रायगडाची तपशीलवार फिल्म घेतली आहे. तीन बाजूनी तुटलेल्या अंदाजे 3 हजार फूट खोल कड्यांची ही टेकडी रायगडाची भव्यता नि उग्रता दर्शवणारी आहे. शिवशाहीत देहान्ताची शिक्षा झालेल्यांचा येथूनच कडेलोट करण्यात येत असे. टकमकीच्या टोकाला निमूळता होत गेलेला अवघा 15-16 फूट रुंदीचा पायरस्ता. ना झाड ना झाडोरा आसपास. वारा वहात असला तर इकडे ढोरसुद्धा चुकून फिरकायचे नाहीं, तर माणसाची कथा काय ? वा-याचा झोत नसेल तर शेवटच्या टोकापर्यन्त धीराचा माणूस जाऊ शकतो. वरून खाली कोठेहि नजर टाकली तर ठरत नाही. डोळे फिरतात. पण 3 हजार फूट खोलावरचा गावांच्या मनोहर पुंजक्यांचा, शेतमळ्यांचा, मधून नागिणीप्रमाणे वहाणा-या नदीचा तो रम्य निसर्गपट पाहिला का डोळ्यांचे पारणे फिटते. उघडलेली छत्री घेऊन टकमकीवर जाणे फारच धोक्याचे. वा-याने छत्री उडवली का छत्रीधराचा निमिषार्धात झालाच समजा कडेलोट.
"छत्रीचा दांडा सोडू नकोस."
एकदा शिवाजी महाराज गडाच्या पहाणीसाठी टकमक टेकडीवर गेले असता, त्यांच्यावर उंच दांड्याची मोठी रेशमी भरजरी छत्री धरणारा हुज-या वा-याच्या झोताने अचानक कड्याबाहेर फेकला गेला. महाराज एकदम मोठ्याने गर्जून ओरडले- "घाबरू नकोस. छत्रीचा दांडा सोडू नकोस. घट्ट धरून ठेव." झाले. तो हुज-या दांडा घट्ट धरून वा-याच्या झोतावर तरंगत तरंगत पायथ्यशी असलेल्या निजामपूर गावात सुखरूप उतरला. तेव्हापासून त्या गावाला छत्री-निजामपूर हे नाव पडले. शिवरायांच्या या प्रसंगसावधानावरून पॅराशूटची कल्पना जुनी का नवी हा प्रश्न पडतो.
महाशय चंद्रशेखरानी या टकमकीचे सर्वांग - चित्रीकरण मोठ्या धाडसाने केले. चारपाच इसमानी त्यांचे पाय नि कपडे मागे खेचून धरलेले आणि हा धाडसी पठ्ठ्या टकमकीच्या थेट अखेरच्या चिंचोळ्या टोकावर उपडा पडून 20 पौंड वजनाचा सिनेकॅमेरा चालवीत आहे. हे दृष्य पाहून
"अरे, याना जीव द्यायचा आहे की काय ?"
अशी सुरबा टिपणिसानी धमकीच्या भयंकर कर्कश आरोळी ठोकली. काम पुरे केल्यावर चंद्रशेखर म्हणाले- " शिवरायाच्या कृपेने माझे चित्रण यशवंत झाले. अहो, असा योग येणार कधी ? समजा, या धाडसात मेलो असतो, तरी शिवरायांच्या समाधीजवळ माझी म-हाठ्याची हाडे पडली असती. आहे कुठे असला योग माझ्या नशिबात ? "
सूर्य कलंडला. साडेतीनचा सुमार. टकमकीकडून आम्ही महाराजांच्या समाधि-स्थानाकडे जायला निघालो. याच वेळी कर्णिक, भुलेसकर, आवळसकर मास्तर आणि त्यांचे वाटाडे रघू टिपणीस परत जाण्यासाठी गड उतरू लागले होते. महाद्वाराच्या बुरजावरून त्यानी आम्हाला जयजयकाराची हारळी दिली. आम्हीहि टकमकीवरून जय महाराष्ट्राचा जबाब दिला.
समाधीचा थोडासा इतिहास.
नागप्पा पेठेपासून ईशान्येकडे जगदीश्वराच्या देवळाचे नि समाधीचे कळस स्पष्ट दिसू लागतात. मूळ समाधीचा पूर्वी नुसता चिरेबंदी चौथराच होता. हासुद्धा कित्येक वर्षे उकीरडा नि झुडपांच्या जाळीखाली गडप झालेला होता. सुप्रसिद्ध मराठी नट कै. यशवंतराव टिपणीस यांचे वडील बंधू कै. तात्या टिपणीस कट्टर शिवभक्त. सन १८९६-९७ साली टिळकांची शिवाजी उत्सवाची चळवळ चालू झाली असताना त्यानी एक दिवशी तो समाधीचा चौथरा हुडकून उरकून बाहेर काढला आणि तेथे भगवा झेण्डा फडकत ठेवला. त्याचे काही दगड निखळले होते. मुंबईचे पारशी इतिहास-संशोधक करकेरिया यानी स्थानिक इंग्रजी वृत्तपत्रांत लेख लिहून मुंबई सरकारचे नि मऱ्हाठी जनतेचे त्या दुर्दशेकडे लक्ष वेधले. तेव्हा समाधीभोवती कुंपण घालून तिच्या जुजबी दुरुस्तीसाठी महाड तालुका कचेरीतून
दर साल पाच रुपये
(पाचशे किंवा पाच हजार नव्हेत हो फक्त पाच रुपये.) इंग्रज बहादुर सरकारातून सांकशन झाले. लोकमान्य टिळकानी हा समाधिदुरुस्तीचा प्रश्न हातात घेऊन बराचसा फंड जमवला. तो पुण्याची डेक्कन बॅंक आणि सरदार नातू यांचेकडे अमानत ठेवला. पुढे त्या बॅंकेचे निघाले दिवाळे आणि रुपयाला अवघे ९ आणे टिळकांच्या हातात परत आले. दुरुस्ती करायची, त्यालाहि सरकारची परवानगी हवीच होती. कारण रायगड पडला सरकारच्या मालकीचा जंगल विभाग. ती परवानगी येता येता सन १९२५ साल उजाडले. अखेर सरकारी पहाणी झाल्यावर, उरलेल्या फंडातर्फे रोख १४ हजार रुपये सरकारकडे भरणा करण्यात आले. फंड लोकांचा, पण समाधीचे काम करणार सरकार . कायदाच पडला तसा!
आधी रायगडासारख्या अवघड चढणीच्या ठिकाणचे समाधीचे बांधकामाचे कंत्राटच कोणी घेईना. एका दोघानी धाडस केले नि ते कुदळ्या मारुन पळाले. अखेर मुंबईचे शिवभक्त कै. महाशय बाळकृष्ण मोरेश्वर ऊर्फ तात्यासाहेब सुळे इंजिनीयर यानी हिरिरीने ते काम पत्करले आणि पुष्कळ त्रास अडचणी सोसून ते पुरे केले. कामगाराना निष्कारण रोजच्या रोज गडाची चढ उतर होऊ नये, एवढ्यासाठी तात्या सुळे रोज रात्री महाडला परत यायचे आणि दुसरे दिवशी पहाटेस कामगारांच्या शिध्याचे गाठोडे पाठीशी बांधून गडावर जायचे.आजच्या घुमटदार समाधीचा प्लॅन सुद्धा तात्यानीच तयार केलेला होता.
समाधीचा पाया खोदण्याचे काम चालू असता १२ फूट खोलीवर पहार अडू लागली. श्री. तात्यानी आसपासचा भाग हलक्या हातानी मोकळा करवला, तेव्हा दोन कमानीवर एक शिळा नि आत पेटीसारखे काही आढळले. शिळा दूर करताच पेटीत शिवरायाच्या अस्थि नि रक्षा नीट जपून ठेवलेल्या सापडल्या. आजूबाजूला राखेचे ढिगार पडलेले होते. सुळे यानी अस्थि नि रक्षा पुन्हा भक्कम बंदोबस्ताने आत पुरल्या. पण बाकीची राख ब्रिटिश सरकारने पेट्याच्या पेट्या भरून गडावरून खाली नेली त्याचे काय झाले समजले नाही.
समाधि-दर्शनाचा आमचा आनंद.
समाधीजवळ येताच महाराजांच्या जयजयकाराचा नुसता हलकल्होळ उडवला सगळ्यानी. सर्वानी आधी त्या महाराष्ट्राच्या मायबापाच्या समाधीवर साष्टांग प्रणिपाताने कपाळे घासली. डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. आमच्या अंतश्र्चक्षूंपुढे 275 वर्षांपूर्वीचा शिवशाही पराक्रमांचा नि वैभवाचा इतिहास चलचित्रपटासारखा भराभर खेळू लागला. जवळच समोर महाराजांच्या
इमानी वाघ्या कुत्र्याची सुंदर समाधि
महाशय श्रीमंत तुकोजीराव होळकर आणि सौ. शर्मिष्ठादेवी होळकर यानी 5 हजार रुपये खर्चून बांधलेली आहे. त्या समाधीच्या माथ्यावर त्या इमानी श्वानाची ब्रांझ धातूची, पुढचे पाय उभे ठेवून महाराजांच्या समाधीकडे टक लावून पहात बसलेली प्रतिमा पहाताच सगळ्यांच्या डोळ्याना टचकन पाणी फुटले आणि त्या इमानी जीवाला प्रणिपात करायला हात चटकन जुळले.
थोरल्या छत्रपतींचा आवडता कुत्रा वाघ्या हे समर्था घरीचे श्वान खरोखरीच सर्वांनी मान देण्यासारखे होते. हा इमानी जीव आबासाहेबांना कधीही विसंबत नसे. अखेर, प्रभूचे शुभावसान झाल्याबरोबर या मुक्या इमानी जीवाने त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली. – राम गणेश गडकरी यांच्या राजसंन्यास नाटकावरून.
असा शिलालेख या समाधीवर लिहिलेला आहे. या समाधीच्या उपक्रमाच्या कामी महाशय अनंतराव चित्रे आणि सुरेन्द्र गोविंद टिपणीस यांचेच परिश्रम मख्यत्वे खर्ची पडलेले आहेत.
येथील वस्तूची किंवा वास्तूची नासधूस करणारावर खटला भरण्याची जीर्णवस्तुसंरक्षक सरकारी खात्याची कायदेशीर धमकी जागोजाग पाट्या ठोकून जाहीर झालेली असली, तरी त्या वस्तूंची अथवा वास्तूंची निगा राखण्याचा सरकारी बंदोबस्त काही नाही. महाराजांच्या नि वाघ्याच्या समाधीवरचे शिलालेख काळे डाग पडून खराब झाले होते. समाधीभोवतालची जागा ढोरांच्या शेणानी नि काट्याकुट्यानी भरून गेली होती. कोणीहि याची तपासपूस किंवा झाडलोट करीत नाही. बरोबर आहे. धोबीका कुत्ता, ना घरका ना दारका ! शिवाजीने कमावलेल्या स्वराज्याच्या आयत्या बिळात वारसदारीच्या अपघाती पुण्याईने नागोबासारखे फुसफुसणारे शेकडो मऱ्हाठे संस्थानिक महाराष्ट्रात आहेत (आता `होते` म्हटले पाहिजे), त्या लेकाच्यानी कधी केली रायगडाची काही कदर? मऱ्हाठी जनतेचे काय! मूळचीच ती दरिद्री! तिला कितीही लाज शरम वाटली, तरी व्यवहाराच्या बाजारात शरम थोडीच चलनी नाणे ठरणार आहे ?
प्रतिमेची पूजाअर्चा.
आम्ही सगळ्यानी पाणी आणून समाधि नि शिलालेख स्वच्छ धुऊन काढले. आजूबाजूची जागा शक्य तेवढी सराट्यानी झाडून साफ केली. इंजिनियर तात्या सुळे यांची कन्या कु. सिंधू नि तिच्याबरोबर आलेल्या कुमारिकानी हळद कुंकू गंधाक्षता फुले ऊदधूपादिकानी महाराजांच्या प्रतिमेची पूजा केली. महाशय चंद्रशेखर आणि मी दोघानी हातांत नारळ घेऊन
छत्रपति श्रीशिवाजी महाराजकी जय
या गर्जनेत ते फोडले. सोपानदेव चौधरीनी त्याच गर्जनेच्या तारस्वरात ललकारी मारून शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा पोवाडा पहाडी आवाजाने गाऊन तेथले सारे वातावरण महाराष्ट्राभिमानाने थरारवून सोडले. प्रसाद वाटल्यावर झटपट पावलानी सूर्यास्ताचा चमत्कार पहाण्यासाठी आम्ही नगारखान्याकडे निघालो. सूर्य अस्ताचलाकडे कलंडला होता. पश्चिमेकडच्या डोंगरांच्या उंचउंच टेकडांचे विशाळ कवडसे पूर्वेकडील डोंगरांच्या रांगांवर पडले होते. जणू काय, काळ्या रंगात बुचकळलेल्या ब्रशाने सतरंजीच्या पट्ट्यासारखे जाडजूड पट्टेच चिता-याने ओढल्यासारखे ते दिसत होते.
काय मनुष्यस्वभाव आहे पहा! समाधीच्या दर्शनपूजनात गर्क झाल्यामुळे , जवळच दहा पंधरा हातांवर उभ्या असलेल्या विशाळ जगदीश्वर मंदीराविषयी काही सांगायचे विसरलो. हे एक हेमाडपंती घाटाचे महादेवाचे मंदीर आहे. त्याचे चिंरेबंदी प्रवेशव्दार प्रेक्षणीय नि भव्य असून, तेथेच या लेखाच्या शिराभागी दिलेला संस्कृत श्लोक वळणदार बालबोध अक्षरानी खोदलेला आहे. या मंदिराचे बांधकाम हिराजी याने केले, असा उंबरठ्यावरहि एक छोटा लेख आहे. आत प्रशस्त आवार असून तेथल्या प्रचंड नंदीचा पुढला भाग कोणीतरी फोडलेला आहे. गाभा-यातली जागा नेहमी पाणथळ असते. अस्मानी सुलतानीच्या वेळी साळुंक्यावरचे शिवलिंग पळवण्यात आले होते म्हणतात. आता आहे ते मागाहून कोणीतरी नव्याने बसवलेले आहे. मंदिरात निजण्या-बसण्याची सोय आहे.
सूर्यास्ताचा दिसणारा चमत्कार.
समाधीकडून बालेकिल्ल्याच्या नगारखान्याकडे म्हणजे गडाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे काठ्या ठोकीत जात असताना, कित्येक ठिकाणी ठक् ठक् तर पुष्कळ जागी डब् डब् असे जमिनीचे आवाज येतात. डब डब आवाजाची जागा अर्थात आतून पोखरलेली असावी. रायगडावर भुयारांचा सुळसुळाट फार. राजधानीच ती. तेव्हा गुप्त भुयारे, खलबतखाने, पळवाटा, चोरवाटा यांचा बंदोबस्त भरपूर ठेवणे अगत्याचेच होते.
वास्तविक बालेकिल्ला धर्मशाळेच्या अगदी जवळ गंगासागराच्या काठावर. पण आम्हाला समाधीच्या दर्शनाची उत्कंठा अतिशय तळमळीची म्हणून तो पहाण्याचे काम दुस-या दिवसावर सोपवून प्रथम आम्ही पूर्वेकडे धावलो. आता फक्त सूर्यास्ताची मौज पदाण्यासाठी किल्ल्याच्या नगारखान्याकडे धावलो.
रायगडावरून मुंबईच्या समुद्रात होणारा सूर्यास्ताचा देखावा म्हणजे निसर्गाची एक प्रेक्षणीय चमत्कृतीच होय. सागराच्या पृष्ठभागाजवळ सूर्य येऊ लागला म्हणजे त्याचे अनेक आकार होतात. प्रथम रांजणासारखा, मग हॅट टोपीसारखा, नंतर दोन बाजूना लहान कड्या असलेल्या फुलांच्या कुंडीसारखा, मागाहून सोन्याच्या कास्केट करंडकासारखा,होडीसारखा, असे कितीतरी निरनिराळे आकार नि प्रकार नगारखान्याच्या शिखरावरून आम्ही पाहिले. याच वेळी फक्त गडावरून समुद्र दिसतो आणि सूर्याची सोनेरी किरणे पाण्यावर तरंगताना पहायला मिळतात.
अंधार पडू लागल्यामुळे यात्रेकरू शिबिरात परतले. भोजनोत्तर चांदण्यात गप्पासप्पा, काव्यविनोद, सोपानदेवांचे उपहासगर्भ विनोदी काव्यगायन वगैरेचा भरपूर रसास्वाद घेतल्यावर सगळे निद्राधीन झाले. सूर्यास्ताप्रमाणे सूर्योदयाचीहि रायगडावर मौज असते. नगारखान्याच्या महाद्वाराच्या कमाणीतून थेट समोर दिसणा-या तोरणा किल्ल्याच्या माथ्यावर अरुणोदयाची प्रभा फाकते नि सूर्योदयाची किरणे त्याला प्रथम सोनेरी किरीट चढवतात. याचे चलच्चित्रण करण्यासाठी अगदी झुंजु-मुंजू होताच निघायचे असा चंद्रशेखर पार्टीचा बेत ठरला होता. पण सबंध दिवसाच्या श्रमाने त्याना खरपूस झोप लागली आणि ते धडपडत उठून धावले, तरी कॅमेरा वगैरे काढून तो रोखण्याच्या आधीच तो चमत्कार घडला. फक्त डोळ्यानी त्यानी पाहिला इतकेच.
गडावर एकहि पक्षी आम्हाला दिसला नाही.
गडावरचे हे एक नवलच. चिमणी नाही, घार नाही, फार काय पण ईश्वराप्रमाणे जळी स्थळी काष्ठी पाषाणी नेहमी आढळणारा कावळाहि गडावर कोठे दिसला नाही. शिखराखाली हजार फुटावर एक दोन घारी तळपताना दिसल्या. टकमकीवरून खोल खालवरच्या भूप्रदेशाचा सिनेफोटो घेताना चंद्रशेखरांच्या फिल्मेत त्या पकडलेल्या आहेत. विंचू काटा साप यांचाहि गडावर उपसर्ग नाही, असे धनगर सांगत होते. कधीमधी वाघोबाची खारी फेरफटक्याला येते. पण आमचे दर्शन घेण्याची त्याना कोठेच लहर लागली नाही.
(दि.२६-१२-१९४९ सोमवारचा कार्यक्रम.)
बालेकिल्ल्याची सर्वसाधारण माहिती.
( रायगडाच्या पठाराची पूर्व-पश्चिम लांबी दीड मैल आणि दक्षिणोत्तर रुंदी एक मैल आहे. उत्तरेला टकमक आणि पूर्वेला भवानी नावाची टोके प्रसिद्ध आहेत.) समाधीच्या खालच्या आंगाला श्रीभवानी देवीचे गुहेसारखे एक स्थान असून, चिंतनासाठी शिवाजी महाराज तेथे जाऊन बसत असत, असे सांगतात. हे अतिशय अवघड जागेचे ठिकाण असल्यामुळे, तेथे जाण्याच्या खटाटोपात कोणी फारसे पडत नाहीत. आमच्यपैकी एका दोघानी तिकडे जाण्याचा ` तानाजी बेत ` करताच, सोबतच्या महार बांधवानी तसे न करण्याविषयी निक्षून सांगितले. धनगरानीहि कानावर हात ठेवले.
होळीचे मैदान.
दहा हजार माणसे सहज बसतील एवढे हे मैदान किल्ला आणि नागप्पा पेठ यांच्या मध्यावर आहे. आता नुसते ओसाड मैदानच असले, तरी पूर्वी येथे शिमग्यानिमित्त किंवा काही उत्सवानिमित्त प्रचंड होळी पेटवण्यात येत असे. तमाशेवाले, पोवाडेवाले शाहीर, गारुडी, भराडी, लळीताची सोंगे, इत्यादि कार्यक्रम या मैदानावर साजरे होत असत आणि शिवाजी महाराज स्वता जनतेबरोबर खेळीमेळीने येऊन कलावंतांचा भरपूर देणग्यानी येथे सत्कार करीत असत.
नगारखाना.
राजदरबाराचे नि बालेकिल्ल्याचे हे विशाल चिरेबंदी महाद्वार आजहि आपल्या गतवैभवाच्या कहाण्या सांगण्यासाठी ताठ उभे आहे. ही नगारखान्याची दर्शनी इमारत 50 फूट उंच नि 30 फूट रुंदीची आहे. उजव्या डाव्या बाजूला पुरुषभर उंचीच्या देवड्या आहेत. डाव्या देवडीवरून नगारखान्याच्या शिखरावर जाण्यासाठी दोन भिंतीमध्ये 29 पाय-यांचा एक दगडी जिना आहे. तेथे दिवसाहि गडद अंधार असतो. टॅर्चशिवाय पुढे पाऊल टाकताच येत नाही. गडबडीत आम्ही कुमारसेन समर्थाशिवाय, कोणीहि टॅर्च आणली नव्हती आणि जिन्याच्या तोंडाशी फलटण जाताच
अहो, टॉर्च लावा, टॉर्च लावा
असा ओरडा मात्र बिनचूक केला. समर्थानी टॅर्च प्रकाश फेकला, पण तो आढळला मिणमिणता! मग काय! तेवढ्यात उजेडात आंधळ्याची माळका एकमेकांचे हात धरून चालली रेटीत पुढे. सबंध गडावरची ही अतिशय उंचीची जागा. येथून चौफेर फार दूरवरचा प्रदेश खासा न्याहाळता येतो. महाड, माणगाव, निजामपूर, बिरवाडी इत्यादि गावे नि खोरी तर दिसतातच, पण
पूर्वेकडचा जिब्राल्टर
म्हणून पाश्र्चात्यानी जगभर ख्यातनाम केलेल्या रायगिरीचे संरक्षण करण्यासाठी चौफेर खडा पहारा देणारे सिंहगड, तोरणा, राजगड, लिंगाणा, प्रतापगड हे किल्लेही येथून दिसतात. गडाधिराज रायगिरीचे हे जागते इमानी पहारेकरी, चहूकडून घोंगावत येणा-या वायुलहरीतून गतवैभवाच्या कितीतरी स्फूर्तिदायक कहाण्या आमच्या कानांत ओरडून सांगत होते. पण आज त्यांचा काय उपयोग ? काय ? उपयोग नाही ? असे कसे होईल ? काळ बदलला तरी शिवरायाने बनवलेली म-हाठ्यांची स्वांतंत्र्यप्रेमी पिण्डप्रवृत्ति बदललेली नाही. त्यांचा मानधनप्रभुपणा अजूनहि ताठर आहे. चालू लोकशाही जमान्यातहि स्वत्वासाठी म-हाठा आपल्या सर्वस्वाचीहि पर्वा करणारा नव्हे.
महाराजांच्या राजाभिषेकाला उल्लेखून दोन संस्कृत श्र्लोक नगारखान्याच्या दरवाजावर खोदलेले आहेत. पलीकडे खाली कुशावर्त तळे असून गडाचे क्षीगोंदे टोके आहे. तेथे श्रीमंत पोतनीस कारखानीस वगैरे महाराजांच्या विश्र्वासू मुत्सद्दी मंडळींच्या वाड्यांचे पडके अवशेष दिसतात. (आजवर पुष्कळांच्या लिहिण्या बोलण्यात येणारा `राज्याभिषेक ` शब्द `राजाभिषेक` असाच पाहिजे. अभिषेक ` राजा`ला होत असतो. `राज्या` ला नव्हे.)
राजदरबार.
नगारखाण्याच्या कमानीतून आत नजर जाताच राजदरबाराचे विस्तीर्ण प्रांगण लागते. समोर २०० फूट अंतरावर मध्यवर्ति उंचवट्यावर श्रीशिवरायाच्या सिंहासनाचा दगडी चबुतरा नजरेला पडताच
वळते अंजुलि नकळत बघुनि तयालार्गी
अशी अवस्था होते. आपल्या भोवती फिरून राजदरबाराचा तो उजाड नि उध्वस्त प्रदेश पहाताच मनश्र्वक्षूंपुढे हजार लाख कोटी जुन्या ऐतिहासिक घटनांचा चित्रपट बिजली वेगाने सरसरत जातो. मनोभावनांचे ते स्नेहाळ तुफान शब्दातीत आहे. आज चारी बाजूंच्या भिंती ताठ उभ्या आहेत. प्रांगणाच्या दोन बाजूना लांबच लांब चढत्या चौथ-याच्या बैठकी दिसतात. एका बाजूला इंग्रेज-फेंच-पोर्तुगीजडचादिकांचे वकील प्रतिनिधि परिवारासह बसले असतील. दुस-या बाजूला स्वराज्याचे मुत्सद्दी सरदार दरकदार सेनापती लढवय्ये दरबारी यांची बैठक असेल. प्रांगणाची लांबी २०० फूट नि रुंदी १५० फूट असावी. मधल्या सरासरी औरसचौरस हजारफुटी मोकळ्या जागेत गायक, शाहीर, कलावंत, नर्तकी नि इतरेजनांची सोय असावी. सिंहासनाची पूर्वाभिमूख बाजू चिरेबंदी जोत्याची कंबरभर उंचीवर असून, एका बाजूला प्रधानमंडळ आणि दुस-या बाजूला राणीवसातील महिला वर्गाची बैठक होती. सिंहासनाचा चबुतरा पूर्वी सोन्याच्या पत्र्याने मढवलेला आणि दुस-या बाजूला राणीवसातील महिला वर्गाची बैठक होती. सिंहासनाचा चबुतरा पूर्वी सोन्याच्या पत्र्याने मढवलेला आणि हिरे-माणकादि रत्नानी जडवलेला असल्याची मुंबईचा आंग्रेज वकील ऑकझिंडन याची साक्ष आहे की त्यावर बसून नगारखान्याच्या महाद्वारातून समोर नजर जाताच दूरचा तोरणा किल्ला स्पष्ट दिसावा. ज्या गडावर हिंदवी स्वराज्याच्या मुहूर्ताचा भगवा झेण्डा महाराजानी प्रथम फडकावला, तो तोरणा किल्ला आपल्या सिंहासनावरून सरळ सहज नजरेत यावा, ही महाराजांची योजना किती वाखाणावी बरे !
शिवशाही मायक्रोफोनचा चमत्कार.
कमीत कमी २०-२५ हजार सभाजन सामावतील अशा या राजदरबारावर आज फक्त आकाशाचेच छत आहे. (पूर्वीही तो असाच उघडा असावासे वाटते. फक्त दरबारानिमित्त शामियाने उभारण्यात येत असतील.) सिंहासनाजवळ उभे राहून सहज आपण काही बोललो तर २०० फूट अंतरावरच्या नगारखान्यापर्यन्त आणि डाव्या उजव्या बाजूच्या भिंतीपर्यन्त आपले बोलणे सहज नि स्पष्ट ऐकू जाते. चमत्कार आम्ही प्रत्यक्ष करून पाहिल्यावर आश्र्चर्याला सीमाच उरली नाही. विजापूरच्या गोलघुमटात ८२ फूट अंतरावर समोरासमोर असणाऱ्या माणसाना एकमेकांचे कुजबुजणेहि स्पष्ट ऐकू येते, अनुभव मी घेतलेला होता. पण उघड्या जागेवरचा हा सहज-ध्वनि प्रेक्षणाचा रायगडी प्रयोग पाहिल्यावर साऊण्ड ऑकॉस्टिक साधण्याइतके स्थापत्यशास्त्र शिवकालीहि चांगलेच अवगत होते, असे कबूल केल्याशिवाय नाही.
राज्यकारभाराचे सेक्रेटरियट.
दरबार हॉलच्या मागेच प्रधान-मंडळाच्या कचे-याचे प्रमाणबद्ध आखलेले चिंरेबंदी चौथरे आढळतात. मध्यावर पंतप्रधानाची कचेरी आणि सभोवार इतर कारभा-यांच्या नि त्यांच्या फडांच्या कचे-या पंतप्रधानाच्या मागणीप्रमाणे हवी ती माहिती पुरवण्यासाठी चटक कोणत्याहि कचेरीतल्या कामदाराला सहज येता जाता यावे, अशी सेक्रेटरियटची मांडणी आधुनिकहि इंजणेरानी अभ्यासण्यासारखी आहे.
गुप्त मसलखाने नि भुयारे.
सहसा कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा चार पाच जागी गुप्त मसलतखान्यांचे चिंरेबंद कमाणीचे भूमिगत दरवाजे आहेत. पाय-या उतरून आत खाली गेले की उजव्या किंवा डाव्या बाजूला भरपूर उजेड असलेली तळघरे आहेत. एक तळघर तर सिंहासनाच्या अगदी जवळ उजव्या बाजूला आहे. सिंहासनावरून सहज उठले असता चटकन गुप्त व्हयला ही सोय दिसते.
दक्षिणेकडे खोलगट सपाटीवर प्रधानांचे बंगले होते. तेथूनहि सेक्रेटरियटला चटकन येता जाता येण्यासारखे भुयारांये गुप्त मार्ग आहेत. तसे म्हटले तर सबंध रायगडच जागोजाग जमिनीखालून पोखरलेला आढळतो. पळवाटा, गुप्त कोठारे, मसलतखाने, आरोपीकडून कबुली जबाब काढण्याचे तुरूंग, क्षणार्धात भूमिगत होउन गडावरून बाहेर निसटण्याचे मार्ग नि जागा, अंधारकोठड्या ठिकठिकाणी असल्याचे दिसते. हे बहुतेक मार्ग नि जागा आता कोंदाटलेल्या आहेत. त्यांचे आवक जावक मार्ग हुडकून काढणे धाडसाचे नि जिकिरीचे काम आहे. एक धोक्याची सूचना मात्र देणे अगत्याचे आहे. किल्ल्याच्या दक्षिणेकडच्या पठारावर काही ठिकाणी खोल भुयारांची तोंडे उघडी पडलेली आहेत. काठी ठोकीत नीट पायांकडे पाहून चालले पाहिजे. नजर चुकून कोठे कसा पाय भसकन आत जाईल नि माणूस २०-२५ फूट खाली अंधा-या भुयारात गडप होईल याचा नेम नाही.
बालेकिल्ला.
गंगासागराच्या दक्षिणेला दोम मनोरे आहेत. आजच्या मोडक्या तोडक्या अवस्थेत त्यांची उंची ४० फूट आहे. पूर्वी हे पाच मजल्यांचे होते. आज फक्त दोनच मजले उरले आहेत. याना १२ पैलू असून प्रत्येकात अडीच फूट रूंदीची नि पुरूषभर उंचीच्या एकेक कमानदार खिडकी आहे. या खिडक्यांत बसून गंगासागरावरील शीतल वायुलहरींचा आस्वाद आणि गडाच्या बाहेरील मनोरम निसर्गाच्या निरीक्षणाचा आंनद मनमुराद लुटता येतो. मजल्याच्या तक्तपोशीचे काम घुमटदार आहे तरी वरच्या मजल्याची जमीन सपाटच आहे , हा या बांधणीचा विशेष पहाण्यासारखा आहे. येथून पश्चिमेला ३१ पाय-या आहेत. त्या उतरून गेल्यावर पालखी दरवाजा लागतो.किल्ल्यात येणाऱ्या जाणा-या राजवंशी स्त्रीपुरुषांच्या पालख्या या दरवाजातून जात येत असत. इतरेजनाना अर्थात हा मार्ग बंद. बालेकिल्ल्याची लांबी ९०० फूट नि रुंदी ४५० फूट. आत इमारतींच्या शिलकी चौथ-यांच्या दोन रांगा लागतात. उजवीकडच्या राण्यांच्या महालांच्या नि डावीकडच्या नोकरचाकरांच्या खोल्यांच्या. इमारती ७ असून त्यांचे सात स्वतंत्र दरवाजे आहेत. दक्षिण दरवाज्यातून बाहेर पडल्यावर गडाचे एक टोक आहे. येथे उघड्या मैदानावर संध्याकाळी राजस्त्रिया मोकळ्या हवेवर करायला जात असत.
महालाच्या शेजारी बेपत्ता शौचकूप आहेत. त्यांच्या कमोदपात्रांची घडणी वर्तमान काळाच्या विलायती पात्रांइतकीच किंबहुना त्याहूनहि विशेष सोयीची म्हटल्यास चालेल. कसलीहि खटपट न करता सगळी घाण थेट किल्ल्याबाहेर आपोआप जाऊन गडाखाली पडत असे.
हिरकणी बुरूज.
टकमकीच्या जोडीचा ` हिरकणीचा कडा ` तितक्याच कडालोटीचा नि नजरफाट घसरणीचा. टकमक नि हिरकणी म्हणजे रायगडाच्या भव्यतेचे दोन विशाळ डोळेच म्हटले तरी चालतील. या कड्याचा एक इतिहास आहे. हिरकणी नावाची पाचाडनजिकच्या कोळंस गावची एक गवळण दुधाचा रतीब घालायला गडावर आली असताना, जाबता-बंदीची सायंकाळची तोफ उडाली नि गडाचे दरवाजे बंद झाले. तिचे तान्हे मूल घरी नि घरची वाट तर झाली बंद! आईचे काळीज ते! तटातटा तुटू लागले. काळोख पडल्यावर हिरकणी त्या निसटत्या तुटत्या कड्यावरून मोठ्या शिताफीने निसटून गेली कोळंसला आपल्या घरी तान्ह्याला पाजायला. दुस-या दिवशी पहाटे रोजच्याप्रमाणे दूध घेऊन हिरकणी गडाच्या दरवाजावर आलेली पाहून, गडकरी चमकले. `अरेच्चा! काल संध्याकाळी ही गडावर अडकून राहिली होती नि आता कशी खालून वर आली?` त्यानी महाराजांकडे वर्दी दिली. हा वेळ पावेंतों रायगड अभेद्य समजला जात होता. एकदा दरवाजा बंद झाला का आतला माणूस बाहेर जायचा नाही, बाहेरचा आत शिरकायचा नाही. चोहीकडून गड चढा-उतरायची तर सोयच नव्हती. आणि प्रकार पहावा तर हा असा! महाराजानी हिरकणीला बोलावून चोकशी केली. "आईचं काळीज, गेलं वाट काढीत मायबाप. त्याला गड काय नि कडे कपारी काय ! " असे तिने सरळ उत्तर दिले. एक साधी गवळण बाई जर या कड्यावरून सहज जाऊ शकते, तर गनिमाला काय कठीण? महाराजानी त्या तुटत्या कड्यावर भक्कम पाषाणांची तटबंदी करून घेतली. `करून घेतली` असे लिहिणे बोलणे फार सोपे आहे. पण खोल खालवर सुमारे २५०० फूट सुळक्यासारख्या सरळ तुटलेल्या कड्यावर आणि ते सुद्धा वरचा १००-१५० फूट भाग सोडून मध्यंतरीच हे बांधणीकाम केले असेलच कसे, हे तत्कालीन आश्चर्य आज घडीलाहि लवमात्र कमी झालेले नाही.
दारूगोळ्यांची कोठी.
श्रीगोंदे टोकाच्या पूर्वेला ही ९० फूट लांब नि २० फूट रुंदीची कोठी आज उध्वस्त झालेली आहे. हिच्या भिंतीची जाडी साडेतीन फूट आहे. समोरच्या काळकाईच्या टोकावरून इंग्रेजानी तोफ चालवून या कोठीचा भडका उडवल्याचे सांगतात. टोपीभर रुपयांच्या लालचीने कोणी एका महाराने इंग्रेजाना ही अचूक माऱ्याची जागा दाखवल्याचा प्रवाद आहे. पण काळकाईचे टोकाचे दूर अंतर पहात्या इतक्या दूरच्या पल्ल्याच्या तोफा त्यावेळी असणेच शक्य नाही. गडावरच फितूर झालेल्यानी दारूकोठी पेटवून दिलेली असावी, असा सरळ अंदाज निघतो.
बारा टाक्यांचा चमत्कार .
या दारूकोठीजवळच कातळात फोडलेली एकाजवळ एक अशी पाण्याने तुडुंब भरलेली बारा टाकी आहेत. कोणत्याहि एका टाक्यांत दगड टाकला तर बाकीच्या सगळ्या टाक्यांतले पाणी हालते.
परतण्याची तयारी .
एवढ्या प्रदेशाचे निरीक्षण, परीक्षण नि चित्रीकरण व्हायला दुपारचे ३ वाजले. गड उतरण्याचे वेध लागले आणि पोटातहि कावळे कावकाव करू लागले. शिबिरात परत येताच सामानसुमान गडाखाली पाठवण्याची आणि भोजने उरकण्याची गडबड उडाली. टोळीटोळीने मंडळी गडाखाली उतरू लागली. रायगडच्या हवेत भूक फार छान लागते. एरवी एक किंवा फार तर दीड चपाती खाणारा माणूस मी. पण गडावर नुसत्या न्याहारीला नाचणीच्या जाडजूड अडीज भाक-या, दह्याचे एक पक्क्या शेराचे गाडगे आणि नारळाएवढा तांबड्यालाल मिरच्यांच्या चटणीचागोळा या बहाद्दराने फन्ना केला.
चढावापेक्षा हे गड-उतरणीचे काम मोठे कठीण नि किचकट. काठीचा नेट घेता घेता खांदाडे दुखू लागले. पायाखालचे बारीक गाटेगोटे सटासट निसटतात. गवत-पाचोळ्यावरून चालणेहि निसरड्याचे असते. काही खोल उतारावर तर चक्क बैठक मारून अनवाणी घसरगुंडी करावी लागते.
सुमारे साडेपाचाच्या सुमाराला आम्ही पाचाड गाठले. तेथल्या जिजामातेच्या इमारतीच्या चौथ-यांचे व बागेचे निरीक्षण चित्रीकरण करून कोंझरकडे धावा घेत निघालो. रोजची सर्विस बस भरल्यामुळे, परत येण्याचे स्पेशल आश्वासन देऊन ती निघून गेली. साडेआठ वाजेपर्यन्त कोंझरच्या उघड्या शेतात तळ ठोकून बसलो सारे गप्पा मारीत, गाणी गात नि एकमेकांच्या नकला करीत. थंडीचा कडाकाहि चांगलाच पडला. काहीजणानी गवत पाचोळा जमवून शेकोट्या केल्या. वचनाला जागून बसगाडी एकदाची आली आणि छत्रपति, रायगड नि जय महाराष्ट्राच्या आरोळ्या ठोकीत ठोकीत आम्ही रायगड-यात्रेकरू 10 च्या सुमाराला महाडला पोचला. तेथे स्नाने भोजन उरकल्यावर सर्वजण निद्रादेवीच्या आधीन झालो.
रायगडाने काय सांगितले ?
पण मला मात्र झोप लागेच ना. मस्तकात अनेक विचारांचे काहूर सारखे रहाळ्या मारू लागले. अर्धवट झोप, अर्धवट जाग, असा प्रकार चालू असता शिवाजी महाराजांसमोर दिल्लीचा भूषण कवि येऊन उभा राहिल्याचे स्वप्न पडले. ध्यानी मनी ते स्वप्नी.
जब न होत सिवाजी
तब सुन्नत होत सबकी
शिवाजी झाला नसता तर तमाम हिंदुस्थानभर इस्लामी सत्तेचा वरवंटा दाबून फिरला असता. नावालाहि हिंदू उरला नसता आणि हिंदुस्थानचे नुसते नाव बदलून, कुडाच्या कारवीलाहि न कळता, एका रात्रीत मागेच त्याचे पाकिस्तान झाले असते ! भूषण कवीचे हे सत्य नि सार्थ उद्धार माझ्या कानात घुमू लागले. त्यांचे साद पडसाद स्वप्नसृष्टी निरनिराळ्या देखाव्यांनी रंगवू लागली.
हिंदुस्थानाला हिंदूंचे स्थान म्हणून जगवायला ज्या पुरुषोत्तमाचा पराक्रम कारण झालो, त्याच्या रायगड राजधानीची किती ही शोचनीय अवस्था ! इंग्लंड स्कॅटलंड आयरलंडातल्या पराक्रमी पुरुषांची वसतिस्थाने नि पराक्रमांच्या जागा ठाकठीक नीट जोपासून जगातल्या फिरस्त्याना तेथे भेट द्यायला लावण्याच्या त्या राष्ट्रीयांच्या खटपटी कोणीकडे आणि ज्या रायगडाने आम्हा हिंदुमात्राचे राष्ट्रीय जीवन नुसते टिकवले इतकेच नव्हे, तर समाज-धर्म-राजकारणी दरा-याने आसेतुहिमाचल पिकवले, त्याची आजची दुर्दशा कोणीकडे ! झोपड्या पिळून काढलेल्या तुटपुंज्या पैशाने बांधलेल्या त्या छत्रपतीच्या पुण्य नि पावन समाधीचीहि साफसफाई कोणी नीट ठेवू नये ? सरकारी सत्ता परकीय असो वा स्वकीय असो. तिला दोष देण्यात अर्थ काय ? मऱ्हाठी आदमी पैशाने दरिद्री खरा, पण शिवरायाच्या लोकोत्तर पराक्रमाने खुलवली-फुलवलेली त्याच्या ह्रदयाची श्रीमंतीहि आज नष्ट झाली काय ?
खरे म्हटले तर शिवरायाची रायगड राजधानी अखिल मऱ्हाठ्यांच्या वार्षिक यात्रेचे पवित्र जत्रास्थान झाली पाहिजे. जन्माला आलेल्या प्रत्येक मऱ्हाठा पुत्र-कन्येचे बारसे (महाराष्ट्रीकरण) शिवरायाच्या समाधीची माती त्या बालकाच्या कपाळी लावून रायगडावर साजरे झाले पाहिजे. मऱ्हाठ्यांच्या जगण्यामरण्याचा संयुक्त महाराष्ट्राचा जिव्हाळ्याचा प्रश्न आज सर्वत्र झंझावातासारखा घोंगावत असताना, दक्खनला महाराष्ट्र बनवणाऱ्या रायगडावरील शिवाजीच्या समाधीच्या दर्शनाची आतुरता तमाम म-हाठ्यांच्या काळजात खळबळली पाहिजे. तेथली पडकी भिंताडे, ते मोडके मनोरे, ओसाड राजदरबार आणि सभोवार पसरलेला सह्याद्रीच्या अनेक गडाचा खडा पहारा जातिवंत मऱ्हाठ्याना आत्मीयत्वाचा जो चटका लावीत, तसा शंभर पंडितांच्या हजार प्रवचन-व्याख्यानानीहि साधणार नाही. तेथल्या तटांच्या
चिऱ्याचिऱ्यातून आत्मस्वरूपाचा साक्षात्कार
मऱ्हाठ्याना होईल. एकदा म-हाठ्यानीच रायगडच्या वार्षिक यात्रेचा क्रम निर्धाराने चालू केला म्हणजे आपोआप त्या पुण्यस्थळाचे जीर्ण रूप आपली उध्वस्ततेची कात टाकून नव्या मन्वंतराचे नवे लेणे पांघरील. म-हाठ्यानो, रायगड तुम्हाला
टाहो फोडून हाका मारीत आहे.
एकदा तरी तेथे जाऊन महाराजांच्या नि त्या इमानी वाघ्याच्या समाधीचे डोळे भरून दर्शन घ्या. अंतर्बाह्य क्रांति होईल तुमच्या जीवनाची.
जय शिवराय ! जय महाराष्ट्र !
सन १६७४ चा हेन्री ऑकझिंडेनचा रायगडचा प्रवास
ता. ६ जून सन १६७४ सोमवार रोजी रायगड राजधानीवर शिवाजी महाराजानी बादशाही दरबार भरवून क्षत्रियकुलावतंसश्रीमच्छत्रपति राजा शिवाजी या नावाने हिंदवी स्वराज्याची द्वाही पुकारली आणि त्याची निशाणी म्हणून, जुने 49 गड, महाराजानी नवीन बांधलेले १११ गड आणि कर्नाटकातील ७९ गड मिळून २३९ गडांवर भगवा झेण्डा नि जरीपटका एका दिवशी एका वेळी फडकावले.
या वेळी इंग्लंडात दुसऱ्या चार्लस राजाची अमदानी चालू होती. राजाभिषेकाच्या या समारंभाला हजर रहाण्यासाठी मुंबईच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या जनरल ऑनजियर गव्हर्नराने आपला मदतनीस हेन्री ऑकझिंडेन याला दोन अधिका-यांसह मुद्दाम पाठविले होते. त्याच्या रायगड प्रवासाने नि त्यानी पाहिलेल्या राजाभिषेकाचे वर्णन जेम्स डग्लस नामक लेखकाने ` बॅम्बे अँड वेस्टर्न इंडिया` या दोन इंग्रेजी ग्रंथात केले आहे. त्या तपशिलावरून सारांशाने मी त्या प्रवासाचे नि निरीक्षणाचे सुटसुटीत वर्णन खाली देत आहे.
मुंबई-पुणे ते महाड नि कोंझरपर्यन्त सध्या बस गाड्यांची सोय असली तरी कोंझरच्या पुढे पाचाड नि तेथून रायगडाचा प्रवास किती दगदगीचा आहे, हे माझ्या प्रवासवर्णनात आलेले आहेच. पण १७ व्या शतकात हा सगळा प्रवास भयंकर दगदगीचा होता. मुंबईहून रायगडला जायचे म्हणजे प्रथम नागोठणे चौल किंवा करंजा बंदरापर्यन्त शिडाच्या गलबताचा प्रवास. तेथून खट्टर खट्टर बैलगाडीचा प्रवास चालू झाला म्हणजे तासाला मैल अशा गोगलगायी वेगाने, पायवाटी कच्च्या सडकेचा धुरोळा, गाडीचे हाडमोडी आचके दचके खात खात नाले-ओढ्यांच्या खबदाडातून गाडी उलटीसुलटी कलंडत लवंडत जायची, असा होता. छानछोकीत नि ऐषआरामात रहाण्याची सवय असलेल्या ऑकझिंडेन कंपूची या प्रवासात त्रेधा तिरपीट उडाली असल्यास नवल ते काय!
ऑकझिंडेन बलून नावाच्या गलबतातून चौल बंदरात आला. तेथून त्याचा बैलगाडीचा प्रवास चालू झाला. महिना मे चा. पाऊस डोक्यावर आलेला. हवा गरम नि कुंद. सडकेच्या धुरोळ्याने नि गाडीच्या आचक्यादचक्यानी बिचाऱ्यांची हाडे खिळखिळी झाली. चौल ते पाचाडच्या गाडीपल्ला त्याने सहा दिवसात रेटला. अखेर पाचाडला य़ेऊन पाहुण्यासाठी उभारलेल्या एका तंबूत ऑकझिंडेनने देशी काथ्याच्या लाकडी खाटेवर आंग टाकून सुटकेचा दीर्घ श्वास सोडला.
ऑकझिंडेन पाचाडला आला तेव्हा गडावर राजाभिषेकासंबंधी अनेक निरनिराळे विधि साजरे होत होते. गडावर शास्त्री पंडित गोसावी कलावंत आणि राज्यातील ठिकठिकाणचे मुत्सद्दी किल्लेदार गडकऱ्यांची गर्दी झाली होती. महाराज प्रतापगडाच्या भवानीचा नवस फेडण्यासाठी नि तिची महापूजा करण्यासाठी तिकडे गेले होते. कोणीहि पाहुणा आला तरी प्रथम पाचाडला त्याची बडदास्त राखून, विचारपूस चौकशी व्हायची आणि गडावर बातमी जायची. इंग्रेज प्रतिनिधीना मेण्यातून वर घेऊन येण्याची मोरोपंत पिंगळ्याने आज्ञा केली आणि गडावर एका चिरेबंदी इमारतीत त्यांची सर्व सोय लावून दिली. प्रतापगडाहून महाराज जूनच्या प्रारंभाला रायगडाला परत आले. तोवर एक महिना ऑकझिंडेन तेथेच राहिला.
जून उजाडताच हवामानात एकदम बदल झाला. आकाश ढगारले. भयंकर उकडू लागले. दिवसाचे उष्णतामान १०४ डिग्री तापले. राजदरबाराच्या आदल्या दिवशी (रविवार ता. ५ जून १६७४ ) तर हवा कुंद झाली. वारा बंद पडला. श्वासोच्छवास घ्यायला माणसाना पंचाईत पडू लागली. पंख्याचा वारा घ्यावा तरिहि गुदमरल्यासारखे होऊ लागले. देसी लोकाना याचे काहीच वाटले नाही तरी गो-या साहेब लोकांची त्रेधा तिरपीट उडाली. तबेल्यातले ठाणबंद घोडे गवतचारा न खाता माना खाली करून उभे. झाडांवरचे पक्षी चोचा वर करून मेघबिंदूंच्या शिडकावाची जणू काय याचना करताहेतसे दिसले. बिचारा ऑकझिंडेन हातघाईवर आला.
तलावाच्या काठी एखाद्या चिंचेच्या किंवा पिंपळाच्या छायेखाली उघड्यावर बसावे म्हणून तो बाहेर पडला. पण कसचे काय नि कसचे काय! तेथेहि वाऱ्याची एक झुळूक येई ना. कातावून गेला अगदी. परत बिऱ्हाडी आला आणि खाटेवर आंग टाकता टाकता म्हणाला:- "जीव जायची वेळ आली आता. कधी येथून सुटका होते कोण जाणे. अरे बाबा शिवाजी येथले मी तुमचे नाच तमाशे पाहिले. कडे चढण्याच्या शर्यती पाहिल्या. कोंबड्यांच्या झुंजा, पतंगांच्या चुरशी, बहिरी ससाण्यानी केलेल्या शिकारी, धनुष्यबाण, भालाफेकी आणि तलवारींचे हातवारे, बोकड माकडांचे खेळ, खूपखूप पाहिले.पण आज मला काय त्यांचे! तुझी सुवर्णतुला झाली, रोज भटभिकाऱ्याना ढेकर येईतोवर जेवायला घातलेस, सूर्यकिरणात तुझ्या भवानी तलवारीचे चमकते हात करून तू दाखवलेस, तुझे हे सारे ठीक आहे. पण मला काय उपयोग? परवा तुझी आई वारली. मला रे काय त्याचे ? शिवाजीने चौवथी बायको केली काय किंवा एकदम ४० बायकांचा तांडा पत्करला काय माझी धडगत दिसत नाही.
अरेरे, मी काय या रायगडावरच मरणार? नि तेथलेच कोणीतरी चारपाच टोपल्या माती माझ्या प्रेतावर टाकून माझी विल्हेवाट लावणार? पूर्व भारतात व्यापार करणारी ईस्ट इंडीया कंपनी जगली काय, मेली काय! मी मात्र रोज नुसत्या बोकडाच्या मांसावर कसाबसा जगत आहे आणि ते मुंबईचे आमचे फॅक्टरीवाले सांजसकाळ मारे सरंगे, पांफरेट, झिंगे नि शिंगाडांच्या मेजवाण्या झोडून धष्टपुष्ट बनता आहेत! शिवाजीच्या असल्या दहा राजाभिषेकाऐवजी या क्षणाला रायगडावर सपाटून वादळ होईल तरी मी त्याचे आंनदाने स्वागत करीन. वादळ, तुफान, झंजावत मला हवा!"
दिवस मावळला. गडावर अंधार पडला. उद्याच्या राजदरबाराची गडबड नि धामधूम अखंड चालली होती. खोलीत गुदमरणी झाली म्हणून वैतागाने ऑकझिंडेनने खिडकी उघडून तोंड बाहेर काढले मात्र, तोच वावटळीच्या तडाक्याने उडालेल्या पाने - पाचोळ्याने त्याच्या तोंडावर एकदम मारा केला. आकाश धुंद झाले. काळेभोर मेघ सैरावैरा भडकू लागले. एकदम कडाड कडकड वीज चमकली. गडगडात चालू झाला. खालून धुळचे लोट उडाले तर वरून धुमाधार पाऊस कोसळू लागला. बिचाऱ्या ऑकझिंडेनला जे हवे होते ते मिळाले.
सबंध रात्रभर विजांचा कडकडात, मेघांचा गडगडात नि पावसाचा थैथयाट चालू होता. पहाटेच्या सुमाराला हे वादळ थंडावले. हवेत आल्हादकारक गारठा आला. पहाट फुटताच पूर्वेकडे तोरणा किल्ल्यावर काळ्या ढगाचे पडदे बाजूला सारून अरूणाने सुवर्णमिश्रित गुलाल उधळला. पाठोपाठ निरभ्र सूर्याची किरणे चमकू लागली. गडाच्या सभोवार पसरलेल्या डोंगरांच्या रांगानी हिरव्यागार पालवीचे शालू पांघरल्यामुळे जिकडे तिकडे प्रसन्नता मंगल हास्य करीत होती. रात्रीच्या पावसाने तुडुंब भरलेल्या तलावात बेडूक डरांव डरांव करू लागले. खेकडे नि इतर भूमिगत किटक प्राणी बाहेर जमिनीवर सरपटू लागले. झाडे झुडपे बहरली. वनस्पतींचा नि रानटी फुलांचा गोड-कडवट मादक परिमळ गडावळ फैलावला. सूर्याने गोंडा फोडताच गडावरल्या एका उंच बुरूजावर उभे राहून एका जमादाराने जोराने शिंग फुंकले. ताबडतोब राजदरबाराच्या नगारखाण्यावर चौघडा, शिंगे, कर्णे, तुता-या, शंख यांचा एकच ध्वनिकल्होळ उडाला. राजाभिषेकाचा राजदरबार भरत आहे, याची ही जाहीर हाकाटणी होती. गडावर जमलेल्या सर्व देशी परदेशी पाहुणे आणि अधिकारी दरबार-मंडपाकडे नीटनेटका जामानिमा करुन जलदीने जाऊ लागले.
आकझिंडेनला आपल्या दोन गो-या सहाका-यांसह दरबारात गेला. व्यवस्थापकानी त्याना याग्य ठिकाणी नेऊन बसवले. राजाभिषेकाचा धार्मिक विधि यापूर्वीच काही दिवस उकरण्यात आला होता. आजच्या दरबारात फक्त
क्षत्रियकुलावतस श्रीमच्छत्रपति राजा शिवाजी
हिंदवी स्वराज्य-संस्थापक म्हणून तमाम दुनियेला जाहीर करायचे होते. छत्रपति शिवाजी महाराज रत्नजडित सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाले होते. भरजरी पोषाक आणि सोन्यामोत्यांच्या दागिने घातलेले सरदार दरकदार दोनी बाजूना शिस्तीने नि आदबीने उभे होते. सिंहासनामागे दोन चोपदार चौऱ्या वारीत होते. युवराज संभाजी नि मोरापंत पेशवे प्रमुख स्थानी बसले होते.
सिंहासनाच्या खाली पायथ्याशी उंच चौरगावर गागाभट्ट जरतारी शालजोडी पांघरून बसले होते. सैन्याधिकारि मोठ्या आदबीने एका बाजूला नागव्या तलवारी खांद्यावर ठेवून उभे होते. सिंहासनाच्या डाव्या बाजूच्या दालनात प्रधानमंडळी आणि उजव्या बाजूच्या दालनात चिकाच्या पडद्याआड राणीवसातला स्त्रीवर्ग बसला होता. महाराजांचा राज्यग्रहणाचा जाहीरनामा एका मोठ्या अधिका-याने वाचून दाखविला. नगारखान्यावर चौघडा, वाजंत्री, शंख, कर्णे, तुता-या वाजल्या. तोफांचे गडगडात उडाले. निरनिराळ्या थोरथोर लोकांचे नि समारंभाला आलेल्या देशोदेशिच्या प्रतिनिधीमचे नजरनजराणे चालू झाले. ऑकझिंडेने आपल्या बैठकीच्या जागेवरच उभा राहिला. शिवरायाची नजर जाताच त्याने कंबर वाकवून प्रणाम केला. `कोण आहेत हे? ` असे विचारताच नारायण शेणवी याने इंग्रजाकडून नजर आलेली हि-याची आंगठी पुढे करून `मुंबईहून आले आहेत टोपकर` असे सांगताच शेणव्याने खूण केली आणि ऑकझिंडेन सिंहासनासमोर जाऊन उभा राहिला. त्याने पुन्हा त्रिवार प्रणाम केला. `येऊ द्या त्याना जवळ` असे शिवाजीने सुचविले. तो चौथरा चढून सिंहासनाजवळ जाऊन उभा राहिला. शिवाजीने क्षेमकुशलतेचा चारदोन शब्द विचारणे झाल्यावर `चला, आता रजा घ्या` अशा अर्थाची भालदारीची ललकारी झाली. सिंहासनाकडे पाठ न फिरवता ऑकझिंडेन आपल्या जागेवर जाऊन बसला.
शिवाजीच्या सिंहासनाचे ऑकझिंडेनने असे वर्णन केले आहे :-
`शृंगारलेल्या मेणाच्या पुतळ्याप्रमाणे शिवाजी सिंहासनावर निश्चळ बसला होता. सिंहासन सोन्याचे असून त्यावर हिरे माणके नि मोत्यांच्या लडी चमकत होत्या. एका बाजूला तोंडात विशाळ दात असलेल्या सोन्याच्या दोन मत्स्याकृति लटकत होत्या. सिंहासनाच्या मेहरापीवर भाल्याच्या पातीसारख्या अनेक पात्या सूर्यकिरणाकृति शोभत होत्या. मधल्या पातीवर सोन्याचा एक तराजू समतोल लटकला होता. छत्रपतीच्या राज्यात सगळ्याना समान न्यायदान मिळेल, असे तो तराजू सुचवीत होता.`
परत जाण्यासाठी ऑकझिंडेन महाद्वाराबाहेर येताच, सोन्याचांदीच्या नि मोत्यांच्या दागिन्यानी नटवलेले शेकडो घोडे रांगेने उभे आणि शेजारी पाच सहा तसेच रंगवलेले नि नटवलेले अंबारीचे हत्ती पाहून तो बुचकळ्यातच पडला. रायगडावर जाण्याचा आज जो ओबडधोबड डोंगरी जिन्याचा मार्ग आहे, तसाच तो पूर्वीहि असल्याचे ऑकझिंडेने सांगतो. फक्त वाट बरीच ठाकठीक नि भक्कम बांधणीची होती इतकेच. अशा त्या मार्गाने हे हत्ती घोडे नि उंट गडावर आणलेच कसे, याचे त्या तिघा इंग्रेजाना मोठे कोडे पडले. मोठमोठ्या तोफा तरी वर कशा आणल्या असतील ? शिवाजीविषयी इंग्रेजांच्या मनात तिटकारा नि द्वेष अपरंपार जळफळत होता, तरीहि ` शिवाजी म्हणजे एक न सुटणारे कोडे आहे बुवा ` असे त्याने उद्गार काढले.
`शिवाजीचा भगवा झेण्डा पाकोळीच्या पंखाच्या आकाराचा नि भगव्या रंगाचा होता. राजदरबारासारख्या मोठ्या प्रसंगासाठी त्याच आकार रंगाचे भरजरी जरीपटका नावाचेहि त्याचे आणखी एक निशाण होते.`
लळीत आणि कथा
`रात्री होळीच्या मैदानावरल्या विस्तीर्ण शामियान्यात लळीत, निरनिराळ्या लोकांची सोंगे आणि कथा-पवाड्यांचा जलसा झाला. खूप गर्दी होती. आम्हीहि गेलो होतो. प्रथम वाद्यांच्या कडकडाटात गणपति देव आला. त्याने खूप मजा केली. अनेक देवांशी लढाया मारून त्याना चीत केले. लढाई चालताना खूप आरडओरडा नि मशालींवर राळ उडवून भडकत्या ज्वाळांचे देखावे दिसत होते. देवादिकांची बरीचशी सोंगे अशी नाचल्यावर, नटवर्गाने निरनिराळ्या लोकांची सोंगे रंगभूमीवर आणून प्रेक्षकाना पोट धरधरून हासायला लावले. प्रथम एक काळाकभिन्न घंटिगण आरब आला. त्याचे तेलकट राठ हात उजेडात तकतकत होते. नंतर एका मुसलमान हाजीचे सोंग आले. रंगवलेली दाढी आणि मक्का-मदिना नि मुष्क अत्तराची त्याची बडबड झाली. मागाहून पोर्तुगीजाचे सोंग आले. तेव्हा ` आली रे आली, पाणकोंबडी आली ` असा गलका झाला. नंतर एका पारश्याचे पात्र आले. नकला करता करता त्याची उंच काळी टोपी कोलमडून खाली पडताच हास्याचा खोकाट उडाला. आता डोईवर घमेल्यासारखी टोपी घातलेला सिंधी व्यापारी आला. नंतर आम्हा इंग्रजांचीहि नक्कल करणारे एक सोंग आले. डोक्यावर जुनीपुराणी टोपी, छाती काढून दिमाखाने चालत आहे. हातातली वेताची छडी सटासट परजीत आहे आणि ` लाव लाव हमकू दारूकी बोतल लाव ` अशी धमकावणीची मागणी करीत आहे. असा तो थाट पाहून आमच्याहि हासून हासून मुरकुंड्या वळल्या.
`नंतर कथा चालू झाली. शिवाजीला कथा फार आवडत असत. एकादे प्राचीन आख्यान, मधून मधून सुस्वर संगीत आणि हरिदासाचे हावभावयुक्त निरूपण, असा हा कथेचा प्रकार असतो. कथा ऐकायला शिवाजी आला होता. कथा संपल्यावर संगीताचा कार्यक्रम चालू झाला. शिवाजीला पोवाडे अतिशय आवडत असत. पोवाड्यांचा जोरदार कार्यक्रम बराच वेळ रंगल्यावर हा करमणुकीचा कार्यक्रम पुरा झाला.`
बेपारी बाण्यात शिवाजीने आंग्रेजानाहि बनवले
राज्याभिषेकादि समारंभ आटोपले तरीहि ऑकझिंडेन रायगडावरच राहिला होता. शिवाजीकडून आंग्रेज कंपनीला १० हजार पागोडा म्हणजे सरासरी ४५ हजार रूपयांचे एक बिल वसूल करायचे होते. हुबळी आणि राजापूरच्या वखारीवर शिवाजीचा हल्ला झाला, तेव्हा कंपनीचे काही नुकसान झाले होते. `ते मी देईन भरून` असे शिवाजीचे आश्वासन होते. त्याची भरपायीहि करून घ्यावी, असा दुजोड बेपारी बेत ऑकझिंडेनच्या या रायगड-सहलीत होता. पण त्याबद्दल भाषा काढायची कशी, केव्हा नि कुठे याची तो वाट पहात बसला होता. गाठ शिवाजीशी होती ती!
आंग्रेज बनियेगिरीत एकपट चलाख तर शिवाजी त्यांचे बारसे खाल्लेला. ऑकझिंडेन म्हणतो :- "रायगडावर शिवाजीने लुटीत आणलेले मोलवान त-हेत-हेच्या कापडांचे ढिगार साठवलेले होते. हिरे, माणके, मोती, यांचे खच पडले होते. शिवाय गडावर त्याची टांकसाळ रोज धूमधडाक्याने लाखो रूपये किंमतीची तांबे-सोन्याची नाणी काढीत होती ते निराळेच. त्याची अब्रू ( पत ) सर्वत्र फार मोठी. पण रोकड रक्कम त्याच्या हातून सुटणे महा कठीण कर्म! अखेर एकदाची आमची भेट झाली.`
सध्या तुम्हाला मी १५ हजार पागोडे (रु. ६७५०० ) किंमतीचे मोलवान कापडचोपड निम्मे किंमतीने देतो आणि बाकीची रक्कम, राजापूर येथे तुम्ही पुन्हा व्यापार चालू करा, मी तुम्हाला परवानगी देतो आणि त्या व्यापाराच्या कर-माफीतून घ्या वळती करून झालं.` असे त्याने सांगितले. बरं, ते कापडचोपड तरी ताबडतोब नाही बरं आमच्या हातात पडणारे. ते तीन वर्षांच्या मुदतीत हप्तेबंदीने आमच्याकडे रवाना होणार. किती उदार दिलदार रायगडचा हा बनिया-राजा हो!"
हाच तो शिवाजीचा रायगड
(आंग्ल वखरकार जेम्स डग्लसचे उद्गार.)
शिवाजीच्या चरित्राचा बराचसा भाग या रायगडावरच रंगलेला आहे. गोवळकोंड्यातल्या खाणींच्या हिरे-माणकांचा ओघ याच गडावर वहात आला आणि शिवाजीने लुटलेल्या सुरत वगैरे 20 शहरांची अलोट संपत्ति येथेच साठवली गेली. रात्रीच्या गडद अंधारात कोंडाणा किल्ला सर करण्यासाठी आपले एक हजार मावळे त्याने येथूनच रवाना केले. पण त्या मुकाबल्यात
गड आला पण सिंह गेला !
येथेच एकदा त्याचे राजकारणी डावपेच हुकले आणि पुरंदरच्या तहाने मोगल बादशहाला 20 गडांची सोडचिट्टी लिहून देणे त्याला भाग पडले. बरोबर ७० हजार सैन्य घेऊन कर्नाटकाच्या स्वारीवर शिवाजी येथूनच निघाला आणि मद्रासेपर्यन्त चौथाई कर वसूल करीत गेला.वडील शहाजीराजांच्या मृत्यूची बातमी त्याला येथेच समजली आणि त्याच्या मातोश्रीचा मृत्यूहि याच ठिकाणी झाला. याच गडावर त्याचा राजाभिषेक झाला, विवाह झाला आणि येथेच अनेक बायका हत्ती घोडे उंट वगैरे ऐश्वर्य मागे ठेवून शिवाजी कालवश झाला. त्याची समाधि गडाच्या पूर्वेकडच्या टोकावर आहे. तिचे चिरे निखळले आहेत. त्यातून रानटी झाडांची रोपटी बाहेर डोकावत आहेत. जवळच्या धर्मशाळेची अवस्था अशीच आहे आणि शेजारच्या देवळातली मूर्ति निखळून खाली उलटीपालटी पडलेली आहे.
शिवाजीविषयी आज कोणीहि फारशी आस्था बाळगीत नाही. रक्ताचे पाणी करून त्याने मोठे विस्तीर्ण धनकनकसंपन्न राज्य कमावले आणि ते कोल्हापूरच्या राजांच्या, सातारच्या भोसल्यांच्या आणि पुण्याच्या पेशव्यांच्या हवाली केले. पण आज काय मौज आहे पहा! त्या शिवाजीच्या समाधीची नुसती डागडुजी करण्यासाठी या तीनहि घराण्यातला आसामी एक छदाम खर्च करीत नाही.
रायगडच्या परिसरात
लेखक - शां. वि. अवळसकर, महाड
(स्नेही महाशय अवळसकर हे कुलाबा जिल्ह्यातील एक झाकले माणिक आहे. पेशा शिक्षकाचा, पण इतिहास-संशोधनाची तळमळ फार मोठी. फुरसत मिळाली रे मिळाली का जुन्या पुराण्या कागद-सनदांच्या शोधासाठी स्वारी पडलीच पायपीट करीत बाहेर. गेली कित्येक वर्षे या त्यांच्या आवडीच्या व्यवसायामुळे, महाशय अवळसकरानी शेकडो खेडीपाडी नि कोकणातले डोंगर दरे पायदळी घातले आहेत. एकाद्याकडे जुन्या कागदपत्रांचा त्याना वास आला पुरे का स्वारी अन्नपाण्याची पर्वा न करता बसलीच तेथे जेठा मारून त्यांचा अभ्यास, चिकित्सा, जुळणी नि नकला करीत. अशा रीतीने त्यानी आजवर अष्टागराच्या इतिहासातले शेकडो दुर्मिळ धागे संशोधून प्रकाशात आणलेले आहेत. आमच्या रायगड यात्रेच्या मेळाव्यात अवळसकर होतेच. रायगडच्या परिसरातली खडान खडा माहिती साक्षेपाने देण्याचा अधिकार त्यांचाच. अर्थात, त्यांच्याकडून आलेली ही माहिती अभ्यासू जनाना महत्त्वाची वाटणार. - ठाकरे )
(१) पाचाडच्या धर्मशाळेपासून प्रत्यक्ष रायगडच्या चढणीला सुरुवात होते. या धर्मशाळेलगतचे एक शेत श्री शिवछत्रपतीनी एका मुसलमान मुजावराला वतन म्हणून दिले होते. त्याचा अंश अजून नांदत असला तरी वतनदारीचे कागदपत्र मात्र नष्ट झाले आहेत.
स्वतः छत्रपति व गडावरील बहुतेक सर्व प्रजाजन क्षत्रिय असल्यामुळे त्याना मांसाहार शास्त्रसंमत होता. ही क्षत्रिय मंडळी शिकारीशिवाय एरवी प्राण्यांची हत्या करीत नसत. तो अधर्म मानीत. म्हणून नित्याच्या आहारासाठी गडावर मांस पुरवण्याचे काम या मुसलमान वतनदाराकडे दिलेले होते. शिवकालात व पेशवेकालात जे निरनिराळे वतनदार निर्माण झाले , त्यांत सरकारी हुकुमाने मांस पुरवणारे वतनदार खाटीक बहुधा मुसलमानच असत. ह्यातील काहीजवळ सनदापत्रे असल्याचे आढळून येते. सुरीच्या पहिल्या वाराचा (फटक्याचा) मान त्यांचा असे.
(२) धर्मशाळा सोडून आपण समोरच दिसणाऱ्या खूबलढा बुरुजाकडे पहात चढू लागलो म्हणजे एक सपाट जागा लागते. आज तेथे करवंदीच्या जाळ्या, आंब्याची झाडे व दगडांच्या राशी आहेत. पण शिवछत्रपतींच्या कालात येथे शिवमंदिरे होती. येथल्या दगडांच्या राशीत शाळुंका पिण्ड्या आढळतात. खूबलढा बुरुजापर्यन्त अशी शिवमंदिरे हारीने दहा पंधरा तरी असावी. काही दगडांवर खोदकाम आढळते. दगडात कोरलेल्या नागांच्या छिन्नभिन्न आकृति आढळतात. त्यामुळे रायगडचा पाचाडकडील पायथा त्या काळात आजच्यासारखा ओसाड व रुक्ष नसून, तेथे मंदिरातील पावित्र्य नांदत असले पाहिजे. शिवकालीन यात्रेकरू वीतरागी शंकराच्या दर्शनाचा आनंद घेतघेत गडावर जात असला पाहिजे.
(3) खूबलढा बुरुजापाशी पाचाडची चढण संपते आणि आपण एका खिंडीच्या माथ्यावर येऊन पोचल्याचे आपल्या ध्यानात येते. येथून डाव्या हाताकडे (ईशान्य, उत्तर व वायव्य) काळनदी व प्रत्यक्ष गडाचा भाग यांच्या दरम्यानचे मैदान लागते. ते नदीच्या बाजूला क्रमाक्रमाने उतरते होत गेले आहे. या विस्तीर्ण मैदानाच्या नयनमनोहर नकाशावर सांदोशी, छत्रनिजामपूर, वाघेरी, वाडी वगैरे इतिहासप्रसिद्ध खेड्यांचे गट दिसतात. नदीपलीकडील डोंगरांच्या रांगात लिंगाणा किल्ला दिसू लागतो.
शिवकाली आणि शिवोत्तर कालात या भागाचे माहात्म्य फार मोठे असल्याचे, त्याच्या ऐतिहासिक समालोचनाकडे आता वळू या.
(अ) सह्याद्रीच्या दोन रांगा आणि दोन नद्यांच्या खो-यातच रायगडचा डोंगर असल्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने तुटक झाला आहे. शिवकाळात घाटावरून येणारा माल कावले आणि वावले या दोन खेड्यांच्या खिंडीतून येई. या खिंडीत छत्रपतीनी चौकी पहारा बसवला होता. बैलांचे लमान या खिंडीतून एक रांग करून सांदोशी गावात उतरत असे. महाराष्ट्राची थर्मापिली जी बाजीप्रभूंची पावनखिंड, तिच्यासारखे या खिंडीचे स्वरूप आहे. बैलांची एकेरी रांग या खिंडीतून घाट उतरू लागे व गळ्यातील घंटांच्या तालावर सांदोशीच्या मैदानात उतरे. या मैदानाच्या विसृत सपाट जागेत घाटी मालाची एक पेठच झाली होती. या बाजारातून छत्रपतींच्या रायगडावर हरजिनसी मालाचा पुरवठा होई. शिवकालात या बाजारपेठेची इतकी भरभराट झाली कीं व्यापारी धनिकांनी येथे अनेक मंदिरे बांधली. त्यांचे अवशेष सांदोशी खेड्याच्या आसपास पुष्कळच आहेत. सुमारे २०-२५ मंदिरांच्या छिन्नविच्छिन्न उजाड राशी येथे पहायला सापडतील. बहुतेक सर्व शिवालये आहेत. पण काही मंदिरे इतर देवदेवतांची असून, मूर्ति सुंदर माठीव दगडाच्या होत्या. काही मूर्ति कर्नाटकासारख्या दूरच्या प्रदेशातील कारागिरानी घडविलेल्या आहेत. या अवशेषांवरून सांदोशीच्या बाजारपेठेचे शिवकालीन ऐतिहासिक स्वरूप अन्तर्दृष्टीपुढे उभे रहाते. येथून डोई-ओझ्याने हरएक प्रकारचा घाटी माल गडावर रवाना होत असे. या पेठेमुळे पाचाड, बीरवाडी इत्यादि तत्कालिन ऐतिहासिक गावाना सधनता प्राप्त झाली.
रायगडच्या इतिहासाचे धागे नीट जुळवायचे झाल्यास या प्रदेशातून २-४ दा तरी पहाणी करीत हिंडणे अत्यावश्यक आहे. मी तसे केले आहे. थोरल्या आबासाहेबांच्या निधनानंतर झुलफीकारखान्याचा वेढा रायगडावर बसला, त्या वेळी ही बाजारपेठ ओस झाली, मंदिरे झाली आणि या प्रदेशाचे समृद्ध स्वरूप नष्ट होऊन त्याला पारतंत्र्याच्या उदासीनतेची अवकळा आली.
या कालात कावले आणि बावले यांच्या दरम्यानच्या खिंडीत जगताप आणि सर्कले घराण्यतील माणसानी बाजीप्रभूसारखा पराक्रम केला. झुलफीकारखानाच्या रायगडी वेढ्याला सहाय देण्यासाठी एक मोगल सरदार येत असताना, जगताप-सर्कले घराण्यातील मंडळीनी त्याला या खिंडीत कणक्या चोप देऊन परत पिटाळल्याची हकिकती कानावर येतात, त्यात तथ्य आहे. पण प्रत्यक्ष कागदपत्रांच्या पुराव्याच्या अभावी अधिक लिहिता येत नाही.
(ब) वाडी गावचे मह्त्व इतिहासात फार मोठे आहे. येथे अठरा जातींची मोठी वस्ती शिवकालात होती. आता ते गाव उजाड पडले आहे. छिन्नविच्छिन्न स्थितीत अस्तव्यस्त पडलेली अनेक घरटी पूर्वीच्या वस्तीच्या खुणा सांगतात. येथील वस्ती गडाशी संबंध असलेल्या लोकांची असे. किल्ल्यावर लागणा-या वस्तूंची कोठारे येथे असत. शिवकालात गडकिल्ल्याच्या तरतुदीच्या दृष्टीने गडांकडे गावे लावून दिलेली असत. वसूल ऐनजिनशी घेत. सरकारी कोठारात मक्तेदारांस स्वखर्चाने मक्ता भरावा लागे. रायगडची कोठारे वाडीस होती. गडावर लागणारा तांदूळ येथे तयार होई. येथूनच पीठ मीठ भाजीपाला दूधदुभते फळफळावळ इत्यादि सर्व वस्तू रोज गडावर रवाना होत असत. गडाच्या या सुव्यवस्थेच्या दृष्टीने या गावाचे महत्व केवढे असेल याची कल्पना करता येते. या गावच्या मोकळ्या पडलेल्या जागांच्या नावातसुद्धा इतिहास आहे. एक ओसाड जागा नागप्पा शेटींचा मळा म्हणून ओळखिली जाते. दुस-या जागेचे नाव ताराबाईंची बाग असे आहे. यावरून सहजच ध्यानी येते कीं गडावरील प्रमुख माणसांच्या मालकीच्या बागा येथेच वाडीलगतच्या भागात असाव्या. झुलफीकारखानाने गड घेतला तेव्हा हा गाव प्रथम उध्वस्त झाला, कोठारे फुटली, गडावरील पुरवठा बंद झाला, तेथल्या सुमारे 300 इमारतीत रहाणा-या राजघराण्यातील माणसांचा, शिबंदीचा नि फोजफाट्याचा कोंडमारा झाला. किल्ला पडल्यानंतर तो शिद्दी खैरियतखानाच्या ताब्यात देण्यात आला. खानाने वाडी येथे एक दगडी कोट बांधला. तेथे शिद्दी सन १७३३ पर्यन्त मजबूत राहिला. सध्या वाडी गावात खैरियतखानाच्या कोटाच्या खुणा दिसतात. वाडीच्या एका बाजूला टकमक टोकाखाली तालीमखाने होते. त्यात ब्राम्हणी पद्धतीने शेण्डी ठेवलेल्या मारुतीच्या मूर्ति स्थापिलेल्या होत्या. त्यातली एक अजून तेथे पहायला मिळते.
(क) छत्र निजामपूर व पाचाडच्या बाजूकडील कोंझर या दोन गावी परटवणी होती. या दोन ठिकाणी गडावरील कपडे धुण्यासाठी आणीत. त्या जागा वृद्ध माणसे अजून दाखवतात.
(ड) खूब लढा बुरुजावरून वाडीच्या बाजूला उतरू लागल्यास आपण एका ऐतिहासिक समाधीपाशी येतो. काळ्याकभिन्न दगडाची ही लहानशी पण टुमदार समाधि, सती गोदावरीची समाधि म्हणून शिवकालापासून प्रसिद्ध आहे. शंभु छत्रपति युवराज असता त्यानी एका ब्राह्मणाच्या सुनेवर भाळून तिला लिंगाणा किल्ल्याजवळील एका जागेत कैदेत ठेवले होते. पुढे हे प्रकरण उघडकीला येताच, थोरल्या महाराजानी सती गोदावरीची सुटका केली. महाराजांच्या संमतीने गोदावरीने या ठिकाणी देहार्पण केले. संभाजीने तिचे क्रियाकर्मांतर केले. जेथे तिने समाधि घेतली तेथे उदक वहात असते. कुंडहि बांधण्यात आले आहे. या कथेची सत्यता पडताळून पहाण्यास साधन नाही.
(४) रायगडच्या परिसरातील प्रत्येक जागेला नि दगडाला जसा असंशोधित इतिहास आहे, तसा येथील आम्रवृक्षानाहि तो आहे. शिवछत्रपतीना फळझाडांचा मोठा षोक होता. शिवपूरच्या बागा प्रसिद्धच आहेत, तसाच रायगडचा आसपासचा भाग छत्रपतीनी मुद्दाम लावलेल्या आम्रवृक्षाकरिता प्रसिद्ध आहे. येथे वेगवेगळ्या मोहरणारी व आंबे देणारी झाडे होती आणि रोज महाराजांसाठी गडावर आम्रफळे रवाना होत असत.
काही किरकोळ मनोरंजक माहिती
महाराने पैज जिंकली
सुळक्यासारख्या तटावर सफाईत चढणे, उंचउंच डोंगरांच्या कडेकपारांवरून आणि खोल द-यांवरून तडाड उडी मारून पार पडणे, या कसबातली शिवाजीची चपळाई दक्खन प्रांतात सर्वश्रुत होती. लहानपणापासूनच मावळातले सगळे डोंगर द-या नि चढणी त्याने पायदळी घातलेल्या होत्या. हे सगळे अनुभव जमेला धरून, राजधानीचा रायगड किल्ला सर्वतोपरी सर्व बाजूनी पक्क्या बंदोबस्तचा अभेद्य नि दुर्गम असा बांधण्याची त्याने कमाल कसोशी केली होती. रायगड संपूर्ण बांधून झाल्यावर, एक दिवस शिवाजीने आसपासच्या सगळ्या लोकांची एक सभा बोलावली. मुख्य दरवाजे आणि ठरलेल्या पायवाटा वगळून, दोर किंवा शिडी साखळी मुळीच न वापरता, जो कोणी पायथ्यापासून गड चढून वर येईल, त्याला मोहरांची एक पिशवी आणि सोन्याचे कडे बक्षिस मिळेल, अशी पैज लावली. रायगड म्हणजे चारहि बाजूनी तुटक्या कड्यांचा. जो तो टकमक पाहू लागला. पण एका महाराने पैजेचा विडा उचलून, एका विशेष बाजूने गड चढून, नगारखान्यावर निशाण चढवून दाखवले. शिवाजीने त्याची पाठ थोपटली, ठरलेले बक्षिस त्याला दिले आणि ती वाट बिकट तटबंदीने बांधून काढली. त्या धाडसी महाराचे नाव आणि ती गडाची वाट, या दोनीहि गोष्टी आज विस्मृतीच्या पडद्याआड दडल्या गेलेल्या आहेत. मागाहून काही वर्षानी हिरकणी गवळणीने केलेला असलाच विक्रम तेवढा इतिहासाने जोपासला आहे.
सुवर्णतुलेचे वजन किती?
राजाभिषेकाच्या मंगलयोगावर शिवाजीने आपली सुवर्णतुला केली. तीत त्याचे वजन 112 (एकशे बारा) रत्तल भरले.
शिवाजीचे हिऱ्यामोत्यांचे प्रेम
शिवाजीला हिऱ्यामोत्यांचा षोक अतिशय होता. हजारो किंवा लाखो रुपये किंमतीचे हिरे - माणिक - मोत्यांचे धन, खिशात पोकळ काठीत किंवा हाताच्या मुठीत, अगदी चिमुकल्या जागेत सहज कोठेहि नेता येण्यासारखेच असे. अनेक प्राणांतिक संकटांच्या प्रसंगी या मोलवान धनाने शिवाजीचे प्राणहि वाचविले आहेत. आग्र्याहून शिवाजी निसटला, तेव्हा त्याला पकडण्यासाठी औरंगझेबाने लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर केली. वेषांतर करून पळत असताना, दिल्लीच्या फौजदाराने त्याला बिनचूक ओळखून अटक केली. शिवाजीने एक लाख रुपये किंमतीचा झगझगता हिरा त्याच्यापुढे धरला. फौजधाराच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने विचार केला, शिवाजीला पकडल्याबद्दल बादशहा मला बक्षिस देणार ते किती? तेवढ्यासाठी शिवाजीचे डोके मारण्यापेक्षा, या एक लाख रुपये किंमतीच्या हिऱ्याने मी माझा संसार गुपचूप सुखासमाधानाचा तरी करीन. शिवाजीच्या डोक्यापेक्षा हा हिरा बरा. त्याने हिरा घेऊन शिवाजीला सोडून दिले.
हातात धरण्याच्या काठीत, जुन्या पायतणांच्या तळव्यात, मेणाच्या गोळ्यात, पोषाखाच्या किनारीत, नोकरांच्या तोंडात, जेथे गुप्त जागा असेल तेथे, मोलवान हिरे माणके दडवून बरोबर बाळगण्याच्या शिवाजीच्या युक्त्याजुक्त्या अनेक असत. शिवाजीची अमदानी म्हणजे हिरेमाणकांची अमदानी, असे आंग्ल बखरकारानी वर्णन केले आहे. टॅवरनियर या परदेशी फिरस्त्याने लिहून ठेवले आहे की गोवळकोंड्यापासून ३० मैलांवरच्या शिवाजीच्या मालकीच्या एका हिऱ्याच्या खाणीत ६० हजार मजूर काम करीत होते. शिवाजीला हिऱ्याची मोहिनी मोठी. चमकदार हिरा पहाताच त्याची नजर गर्रकन त्याकडे जायची. हे गमक ओळखूनच मुंबईकर आंग्रेजानी आपल्या ऑकझिण्डेन वकीलाबरोबर त्याला हिऱ्याच्या आंगठीचा नजराणा पाठवला होता कीं काय नकळे! कारण, ऑकझिण्डेन म्हणतो कीं `नारायण शेणव्याने आमच्या आहेराची हिऱ्याची आंगठी शिवाजीपुढे धरताच त्याने चटकन आमच्याकडे नजर फिरवली आणि बोलवा त्याना इकडे, असा हुकूम केला.` त्या अंगठीची किंमत अवघी १२५ रुपये होती.
शिवाजीचे स्त्रीदाक्षिण्य
रायगडावरील एका विहिरीजवळ शिवाजीची बसण्याची जागा बांधलेली होती. तेथे बायका-मुले निर्भयपणे पाणी भरण्यासाठी येत असत. शिवाजी मुलाना जवळ बोलावून त्याना फळफळावर मेवामिठाई द्यायचा, त्यांच्याबरोबर खेळाखिदळायचा आणि बायकांशीहि चार गोड शब्द बोलून, त्यांच्या घरची चौकशी करायचा. (शिवाजीचे हे स्त्रीदाक्षिण्य त्याच्या मूर्ख पुत्राने - संभाजीने - धुळीला मिळवल्याबद्दल आंग्ल बखरकारानी दु:खोद्गार काढले आहेत.)
असे जरी होते, तरी स्वारीशिकारीत सैन्याबरोबर स्त्रिया आणलेल्या किंवा आलेल्या शिवाजीला मुळीच खपत नसे. सैन्यात बायकांचा संसर्गहि तो सहन करीत नसे. याविषयी त्याचे दण्डक फार कडक असत. स्त्रीकण्ठातून निघणा-या मंजुमधुर आवाजापेक्षा, शत्रूच्या घोड्यांच्या कर्कश खिंकाळण्या त्याला गोड वाटायच्या असे जेम्स डग्लस म्हणतो.
आगीच्या डोंबाळ्यात कोण बरे ती?
ता. १० मे सन १८१८ रोजी कर्नल प्रॉथरने तोफांची धडेबाजी करून रायगड जिंकला. त्याचे सैनिक गडावर चढले. शेकडो इमारती धाडधाड जळत होत्या. गडावर जिकडेतिकडे आगीचे डोबाळे, धूर, कोसळणाऱ्या इमारतींचे घडघडाट चालले होते. गडभर रखरखत्या निखाऱ्यांचा नुसता सडा पडला होता. टोपकरांचे सैनिक कोठे कोण दडला आहे, काय करीत आहे, याचा मागमूस घेत असताना, एक सौदर्यवान देखणी अबला आगीच्या लाटातून निवाऱ्यासाठी सैरावैरा लपतछपत धावत पळत आहे अशी त्याना दिसली.
कोण बर ती असावी? पेशवाईवर काळाची वाकडी नजर फिरल्यावर, शेवटच्या बाजीरावाने आपल्या सौभाग्यवती वाराणशीबाई राणीला सुरक्षिततेसाठी रायगडावर धाडली होती. त्याच बिचारीला छत्रपतींच्या त्या थोर राजधानीच्या रायगडावर मऱ्हाठशाहीची ती आग्याडोंब अखेर पहाण्याचा दुर्धर प्रसंग आला आणि रायगडाच्या धुमसत्या राखरागोळीतच मऱ्हाटशाहीची अखेर तिला उघड्या डोळ्यानी पहावी लागली.
रायगडाच्या जीवनातील काय, कसे, कां, केव्हा घडले?
सन १६७२. "रायरी गड आदीलशाही होता तो (शिवाजी राजानी) घेतला. राजा खासा जाऊन पाहता गड बहूत चखोट. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे, दिड गांव उंच, पर्जन्यकाळीं कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे... आणि बोलिले तक्तास जागा गड हाच करावा. असे करारीं करून तेच गडी घर वाडे माडिया सदरा घटी महाल चुनेगच्ची बांधले. खर्च 50 हजार होन."
६ जून १६७४ पहाटे शिवरायाचा राजाभिषेक झाला.
१९ जून १६७६ नेताजी पालकराला परत हिंदू धर्मात घेतले.
३ एप्रिल १६८० छत्रपति शिवाजी महाराज दिवंगत झाले.
२१ एप्रिल १६८० संभाजिला डावलून बाल राजारामाला छत्रपति म्हणून मंचकारूढ करण्याच्या कटाने अनाजी दत्तोने म-हाठमंडळात कलीचे बिजारोपण केले.
१८ जून १६८० संभाजीने पन्हाळ्यातून येऊन राज्यसूत्रे हातात घेतली. सर्व राजकारणी कटबाजाना क्षमा केली.
६ जानेवारी १६८१ संभाजीचा राज्यभिषेक.
ऑगष्ट १६८१ अनाजी दत्तो आणि सोयराबाई यानी हिरोजी फरजंदाला हाताशी घेऊन संभाजीच्या जेवणात विषप्रयोग करविला. तो चटकन उघडकीला येऊन राजा वाचला, पण राजाआधी मुद्दाम अन्न चाखणारा एक इमानी पोऱ्या आणि कुत्रा त्या विषाला बळी पडले.
सप्टेम्बर १६८१ सोयराबाईने विषप्राशन करून आत्महत्या केली.
२५ मार्च १६८९ झुलफीकारखानाचा रायगडाला वेढा.
५ एप्रिल १६८९ येसूबाई नि युवराज शिवाजी (शाहू ) रायगडाचा अखेरचा निरोप घेतात. रायगडाचे ऐक्ष्वर्य संपले.
३ नवंबर १६८९ हवालदाराच्या हरांमखोरीने रायगड मोगलाच्या ताब्यात जातो. मऱ्हाठ मंडळाने तमाम महाराष्ट्रभर बादशाही फौजेची चोहीकडून लांडगेतोड चालू केली.
महाराष्ट्रगीत
-
सोपानदेव चौधरी
जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा
सकल गुणांचा राजा
मराठ-वाडा, विदर्भ आणि खानदेशचे शेतमळे
गोमांतक नंदनवज माझे कोंकण फुलवी फुले फळे
तापि, नर्मदा, गोदा, कृष्णा, आणि तुंगभद्रा, भीमा
जीवन अर्पित पुढे चालल्या देशबांधवाच्या कामा
माय माउल्या गिरिजा
जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा १
सह्याद्रीच्या लिपींत लिहिला वीरश्रीचा इतिहास
पूज्य समाधी विरामचिन्हें संतजनांचा सहवास
शौर्य धैर्य त्यागानें ज्यांच्या भूषविले तुझिवा विभवा
शक्ति आणखी भक्तीचा हा इथेंच जुळला खरा दुवा!
हीच प्रभूची पूजा
जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा २
सचेतनासी द्याया मसलत अचेतनाला फूटे गिरा
मराठमोळ्या ! तुला सांगतो रायगडाचा चिरा चिरा
इथे पताका आणिक भाला ताल मृदंगी ढाल चढे
वारक-याचा धारकरी हो शिंपुनी सडे
जय महाराष्ट्र गर्जा
जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा ३
ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकया, समर्थ संताची माला
मालवतेची वीज रोवुनी सदा जागविति आम्हांला
वंद्य शिवाजी, पहिले बाजी, लोकमान्य ऐसे वीर
स्वांतंत्र्याचा मंत्र देउनी केला ज्यांनी संचार
दावुनिया नवतेजा
जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा ४
संकट येतां लढतो आम्ही धांव घेत उत्तरेकडे
भारत देशा संरक्षाया सैन्य आमुचे सदा खडे
परंपरेने देत आम्हांला शक्ति आणि वेदना धडे
करांत कर घालुनी चालल्या बुध्दि आणि भावना पुढें
उघड ह्रदय- दरवाजा
जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा ५