प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
पहिल्या आवृत्तीविषयी
प्रतापसिंह छत्रपति
आणि
रंगो बापूजी
अर्थात
साताऱ्याच्या राज्यक्रांतीचा इतिहास
लेखक
केशव सीताराम ठाकरे
(प्रबोधनकार)
प्रकाशक
रघुनाथ दिपाजी देसाई,
नवभारत प्रकाशन संस्था, मुंबई ४
मूळ ग्रंथाची एकूण पाने ६३२
प्रकाशन वर्ष १९४८
किंमत दहा रुपये
मुद्रक
रघुनाथ दिपाजी देसाई,
न्यू भारत प्रिंटिंग प्रेस,
६ केळेवाडी, गिरगाव, मुंबई नं ४
कोल्हापूरचे छत्रपति राजर्षि शाहू महाराज यांचे तेजस्वी उद्गार
(ब्राम्हणेतर बहुजन समाजांच्या उठावाची चळवळ बंद करण्याविषयी इंग्रेज सरकार आणि काही वजनदार गोरे अधिकारी यानी आग्रह केला, तेव्हा महाराजानी लेखी जबाब दिला तो.)
"क्षत्रियाला अनुचित रीतीने मला वागतां येणार नाही. मला कैद केले तरी माझा देह कोणत्या ना कोणत्या सत्कारणींच खर्चण्याचा मी यत्न करणार. ज्या रणभूमीवर मी उभा राहिलो आहे तेथून पाय मागे घेणे, म्हणजे माझ्या शीलाला डाग लावण्यासारखे आहे. तुमच्या उपदेशाप्रमाणे वागणे मला अशक्य आहे. लॉर्ड. यानीच काय, पण खुद्द ब्रम्हदेवाने अथवा यमाने मला धमकी घातली आणि मी भ्यालो, तर माझे पूर्वज नि स्वर्गातले देव माझ्याकडे पाहून हासतील नि रडतील. जयापजयाची मला पर्वा नाही. माझा स्वभाव तुम्हाला बदलतां येणार नाही. भित्र्या भागूबाईप्रमाणे मी माझी मते सोडणार नाही किंवा जीव बचावण्यासाठी देखिल शरण जाणार नाही. मी तुटेन, पण वाकणार नाही. जपमाळ ओढीत भटजीसारखा मी कालक्षेप करणार नाही. सरकार रागवेल, असे तुम्ही म्हणता? रागावो बिचारे! मला त्रास होईल यांत संशय नाही. पण गरजवंताना मदत केल्याबद्दल, अस्पृश्याना हात दिल्याबद्दल आणि मराठ्यादि मागासलेल्या बहुजनसमाजांचा उद्धार करण्याकरिता माझी शक्ति खर्च केल्याबद्दल, परमेश्वराकडून खचित मला न्याय मिळेल. माझ्या पूर्वजांचे स्मरण करून मी तुम्हाला सांगतो कीं क्षत्रियाला अयोग्य असे मी काहीहि करणार नाही. माझ्या आईच्या नांवाला मी काळिमा लावणार नाही. तुमचे धोरण मला बिलकूल मान्य नाही."
सातारचे छत्रपति सत्यनिष्ठ प्रतापसिंह ऊर्फ बुवासाहेब महाराज यांचे तेजस्वी उद्गार
गवर्नर सर जेम्स रिव्हेट कारन्याकला तोंडावर दिलेला जबाब-
"राज्य जाईल अशी धमकी देता कशाला? मी कधीच राज्याची हांव घरलेली नाही. उघड चौकशीशिवाय केलेले आरोप मुकाट्याने मान्य करून राज्यावर राहण्याची माझी मुळीच इच्छा नाही. जे गुन्हे मी केलेच नाहीत, त्याना उघड चौकशीशिवाय, केवळ तुम्ही सांगता म्हणून मी मान्यता देऊ? प्राणांतीहि ते शक्य नाही, समजलात. मी कधि कोणाचे काही वांकडे केलेच नाही तर तुम्हाला किंवा प्रत्यक्ष काळालाहि मी भिणार नाही. नुसत्या माझ्या कबुलीच्या सहीसाठी एवढ्या विनवण्या कशाला करता नि धाक तरी कशाला देता? छाती असेल तर करा ना उघड चौकशी. कटाचा एकेक मुद्दा तुमच्या पदरांत घालून खऱ्या खोट्याचा निवाडा आत्ताच दाखवतो. हव्या त्या कबुली जबाबावर सहीं करायला मी काही बाजीराव नव्हे! तो बिचारा भेदरट भटजी होता, म्हणून त्याचे राज्य तुम्ही घेतले. त्याच्यासारखा मी तुमच्यापुढे डगमगणारा नव्हे बरे का नामदारसाहेब, माझे चिमुकले राज्य! राहिले काय नि गेले काय! माझी कशालाच काही हरकत नाही. पण लक्ष्यात ठेवा, काही वाटेल ते केलेत तरी असत्यापुढे या प्रतापसिंहाची मान रेसभरसुद्धा वाकणार नाही. फायद्याचा किंवा स्वार्थाचा लोभ धरून, मी आपले चारित्र्य कलंकित करून घेणारा नव्हे. तुमच्या या चिठोऱ्यावर मी सही करीत नाही जा."
गवर्नर जनरल लॉर्ड हार्डिजला दिलेला जबाब-
"तुम्ही मला एकादा दुकानदार महाजन, सावकार, बंगाली बाबू किंवा जमीनदार शेतकरी समजता? समजता तरी कोण मला तुम्ही? मऱ्हाठी स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराजाच्या गादीवरचा मी त्यांचा खास वंशज आहे. त्या स्वराज्यावरील हक्क मी सोडून देऊ म्हणतां? असे करून माझ्या पूर्वजांच्या नांवाला मी तर कलंक लावणार नाहीच, पण माझा एकहि वंशज तसे करणार नाही. तुमच्या अटी मान्य करण्यापेक्षा मी मरण पत्करीन."
तमाम मऱ्हाठ्याना लंडनहून मारलेली रंगो बापूजीची निर्वाणीची हांक
"कोर्ट डरेकटरस याचा मतलब नजरेस येतो की महाराष्ट्र राज्ये बुडऊन आपले घरात घालावे सारे राज्य आपले घरात घ्यावे. हिंदूचे राज्य बुडवावे आसा क्रम सुरू आहे. परंतु ईश्वर कस करतो ते पाहावे. हा समय औरंगजिबियाचा, जसे सर्व हिंदू बुडवावे, तसा आहे. ईश्वर हिंदू राज्ये बुडवील असे घडणार नाही. कारण औरंगजीब या क्रमात मेले. सेवटी हिंदूलोक राज्येसुधा कायेम आहेत. आसेच ईश्वर करील असे वाटते याजकरिता हिंदूमंडलीतील सर्वत्र दोस्त अगर दुष्मान याणी पुर्ते दिलात आणावे आणि हिंदू धर्म संरक्षणावर नजर ठेऊन सर्वत्रानी कृपा करून येकदिलीने जसी ज्याचे हाते मदत होईल, त्याप्रमाणे करावे, हे मागणे आहे. चोराचे टोलीस आबरू गैरआबरू पहाण्याची गरज नसती. कसाहि फायदा झाले म्हणजे झाले. त्याप्रमाणे हे ईष्ट इंडिया कंपनी बनिया व्यापारी याचे नौकर कोर्ट डरेकटरस यांची रीत मारवाडी लोकाप्रमाणे आहे. जबरदस्त जबरी करिते तरी बेहत्तर. परंतु भरवसा वचने देऊन, माणसास करार मदारात गुतऊन, अखेर तेच तरकट करून, खोटा टपका ठेऊन, बुडवून सर्व अपहाराची इच्छा महाराष्ट्र राज्य बुडवावे, हिंदु धर्म उछेद करावा आसा क्रम मनोभाव नजरेस येतो. या लोकास भ्याले किंवा नरमाई दाखविली म्हणजे तात्काळ गला कापतात. दूरचे दूर सख्त खरेपणानी बोलणे जेव्हाच्या तेव्हा जाहले म्हणजे जबरदस्त लाच्यार होतात. तूर्त राज्य नाही. मग नरमाई व आर्जव कर्ण कशास पाहिजे. माझे लिहिण्याचा बेभरवसा मानू नका. न जाणे आंदेशा आल्यास, हे लिहिणे खरे किंवा खोटे, हे माझे देहसमाप्ती जाहल्यावर पुढे नजरेस येईल."
प्रास्ताविक
१९४८ साली प्रसिद्ध झालेल्या रंगो बापूजी चरित्राच्या मूळ ग्रंथाला कोणतीही प्रस्तावना नाही. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने १९९८ साली प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्मयाचा दुसरा खंड म्हणून हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्याला प्रसिद्ध इतिहास लेखक डॉ. अ.रा. कुलकर्णी यांची अभ्यासपूर्ण आणि दीर्घ प्रस्तावना आहे.
राजर्षि छत्रपती शाहू महाराज मृत्यूशय्येवर असताना ५ मे १९२२ रोजी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी शपथ घेतली होती की, "सत्यनिष्ठ छत्रपती प्रतापसिंह आणि छत्रपतिनिष्ठ रंगो बापूजी यांचा तपशीलवार इतिहास मी लिहितो" सतत ३० वर्षे मेहनत करून, उपलब्ध सर्व साधनांची छाननी करून २१ मे १९४७ रोजी ग्रंथ पूर्ण केला आणि तो राजर्षीच्या स्मृतीला अर्पण केला. पुढे `प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी` या नावाने हा ग्रंथ १९४८ साली प्रसिद्ध केला आणि आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात एक मौलिक भर घातली.
सातारचे राजे प्रतापसिंह आणि मावळातील एक वतनदार रंगो बापूजी यांची चरित्रे परस्पराशी इतकी निगडित आहेत की सातारा राज्याचा उदय, विकास आणि अस्त यांचा विचार करताना या दोन व्यक्तींच्या कार्याचा विचार एकत्रितपणे करणे अनिवार्य आहे, आणि म्हणूनच प्रबोधनकारांनी ग्रंथाची रचना तशी केली असावी. या चरित्रात इतर जी प्रसंगानुसार पात्रे आणि अमित्र येतात त्यांत बाळाजीपंत हा देशी आणि एलफिन्स्टन, ग्रँट डफ बिग्ज, कॅप्टन रॉबर्टसन, कॅप्टन कोगन, लाडविक यांच्यासारखे स्थानिक अधिकारी मित्र, कर्नल ओव्हन्स, रॉबर्ट ग्रँट, सर जेम्स रिवेट कारनेक हे जन्मवैरी आणि शेवटी डॉ. मिल्न, पार्लमेंटचा सभासद जोसेफ ह्यूम, जॉर्ज थॉमसन सारखे परदेशस्थ पाठीराखे यांचा उल्लेख करावा लागेल.
असे असले तरी या चरित्रग्रंथात प्रामुख्याने तीन व्यक्ती आल्या आहेत. दोन नायक राजा प्रतापसिंह आणि रंगो बापूजी आणि एक खलनायक बाळाजीपंत नातू आणि त्याला हाताशी धरून खेळी करणारा मुंबई इलाख्याचा गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रँट, सूडबुद्धीने माणूस पेटला म्हणजे तो कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो याचे अलिकडच्या काळातील एक उदाहरण म्हणजे बाळाजीपंत नातू, प्रबोधनकारांनी एकूण ३० प्रकरणांत (पृष्ठे २७५) आणि त्यास पूरक अशा विस्तृत परिशिष्टांत हे चरित्र कथन तपशीलवार केले आहे. त्यांच्या मते प्रतापसिंह आणि रंगो बापूजी म्हणजेच साताऱ्याच्या राजक्रांतीचा इतिहास.
या ग्रंथाचा मुख्य चरित्र नायक म्हणजे रंगो बापूजी पण त्याच्या जन्ममृत्यूची नोंद कोठे नाही. रंगो बापूजीच्या आयुष्यातील लक्षणीय कार्याला उठाव मिळावा म्हणून त्याचे पूर्ववृत्त सांगतांना प्रबोधनकारांनी शिवाजीराजाच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याची पार्श्वभूमी मोठ्या औचित्यपूर्णपणे या ठिकाणी मांडली आहे. `हिंदवी स्वराज्य` या शब्द प्रयोगाबद्दल जरी काही मतभेद असले तरी दादाजी नरसप्रभूची पत्रे, हे महाराष्ट्र राज्य आहे ह्य जेधे करण्यातील उल्लेख या आणि इतर समकालीन साधनावरून `शेंद्री` (सह्याद्री) लगतच्या स्वयंभू रोहिरेश्वराच्या मनांतील `हे राज्य व्हावे` ही इच्छा `बंडवाल्या` शिवरायांनी कशी पूर्ण केली. याचे थोडक्यात पण समर्पकपणे निरूपण प्रबोधनकारांनी केले आहे आणि पुढील कथावस्तूची पार्श्वभूमी उत्तम रीतीने तयार केली आहे.
१७ व्या आणि काही अंशी महाराष्ट्राचा इतिहास हा वतनासाठी झालेल्या भांडणतंट्यानी भरलेला आहे. ऐतिहासिक घराण्यांची जी कागदपत्रे प्रसिद्ध झालेली आहेत त्यांत वतन हाच विषय प्रामुख्याने आला आहे. याचे कारण `वतन` हे सामाजिक प्रतिष्ठेचे आणि राजकीय आकांक्षेचे साधन होते. त्यांतला आर्थिक माग हा गौण स्वरूपाचा होता. `उतरंडीला नसेना दाणा, पण दादला असावा पाटील राणा` या लोकगीतावरून `वतन` ही संस्था मध्ययुगात सामाजिकदृष्ट्या किंती मोलाची होती याची कल्पना येईल. दिल्लीपतीला नियंत्रित करणाऱ्या महादजी शिंद्याला वकिल-इ-मुतालिक या पदापेक्षा श्री गोंद्याचा `पाटीलबाबा` हा किताब अधिक भूषणाचा वाटत होता. तेव्हा वतनासाठी धडपड ही गुप्ते घराण्यातील लोकांनाही अटळ होती. आणि म्हणून रंगो बापूजीने वतनासाठी धडपड केली या कारणाने त्याला दोषी ठरविणे योग्य ठरणार नाही.
शिवरायाकडून आपल्या वंशजांना मिळालेले वतन हे `राष्ट्रसेवेसाठी` आहे. `वतनदार` हे राज्याचे `दायाद` खरे पण `दायाद` म्हणजे वाटेकरी नव्हे तर कार्यातील `सहकारी` होत याची जाणीव ठेवून आपल्या वर्तनावर पाणी सोडून अनेक वतनदार शिवकार्यात सामील झाले होते, रंगो बापूजीला ही विचारसरणी मान्य असावी. १६५५ साली गुंजणमावळच्या देशमुखाला अभयदान देताना शिवाजीराजे म्हणतात, `आमच्या इमानावरी आपली मान ठेवून आम्हापासी येणे. कोणे गोष्टीची चिंता न करणे` हे अभयदानच रंगो बापूजीला प्रेरणा देणारे ठरले असावे, हे कसल्याही पदाची अपेक्षा न करता केवळ प्रतापसिंहाच्या इमानावरी आपली मान ठेवून रंगो बापूजी निष्ठेने लढला हे प्रबोधनकारांनी रेखाटलेल्या त्याच्या चरित्ररेखेवरून स्पष्ट होते.
१८०३ च्या वसईच्या तहाने रावबाजीने `मराठी राज्य` इंग्रजांच्या पतपेढीवर (?) गहाण टाकले होते. १८११ साली एलफिन्स्टन पुण्याच्या रेसिडेंट म्हणून आला. त्याची नियुक्ती ही `जणूकाय` `मराठी राज्याची` दिवाळखोरी जाहीर करून ते लंपास करण्यासाठीच विधात्याने केली होती. योगायोग असा की हा साहेब १७९५ साली आपले नशीब काढण्यासाठी म्हणून मायदेश सोडून भारतात आला आणि १७९६ साली त्याची पहिली नेमणूक बनारस येथे न्याय खात्यातील एक साधा सहाय्यक म्हणून झाली आणि नेमके त्याच वर्षी दुसरा बाजीराव पेशवा झाला. पुढे बाजीरावाला पदच्युत करून त्याची नेमणूक बनारस जवळच्या परिसरांत ब्रम्हवर्तात केली, आणि दुर्दैवाने १८३९ साली सातारच्या प्रतापसिंहाला याच शहरी वनवासासाठी धाडण्यात आले आणि मराठ्यांच्या सत्तेची उरलीसुरली नावनिशाणीही उध्वस्त होण्याच्या मार्गाला लागली. `काशी` हे ठिकाण मराठ्यांच्या उत्कर्षकाल आणि विनाशकाल यांच्याशी अप्रत्यक्ष रीत्या निगडीत झाले आहे. `मराठा पातशाहा एवढा पत्रपति झाला.` या मंत्राचा उद्घोष करण्यासाठी गागाभट्ट काशीहून आला, परमानंदाने शिवचरित्राचे प्रवचन काशीत केले आणि त्याच काशीच्या परिसरात छत्रपतीचे राज्य खालसा करून प्रथम दुसन्या बाजीरावाला आणि मराठी सत्तेची नामोनिशाणी देखील राहू नये म्हणून इंग्रजांनी प्रतापसिंहाला पाठविले. इतिहासाचे वळण हे असे अनाकलनीय असते.
प्रतापसिंहाला आपल्या वर्चस्वाखाली ठेवण्यासाठी रावबाजी आणि कंपनी सरकार आपापल्या परीने प्रयत्न करीत होते. सातारचे राजे दुसरे शाहू महाराज तथा आबासाहेब यांच्या मृत्यूनंतर १८०८ साली प्रतापसिंह मराठी दौलतीचा धनी बनला. तुम्ही थोरले शाहू व मी चोरला बाजीराव असे आपले नाते राहील, अशी बतावणी करून राजाला आपल्या अंकित ठेवण्यासाठी साखरपेरणीचे काम रावबाजी सतत करीत होता. पण राजाची होणारी कुचंबणा लोकांच्या लक्षात येत होती. अशावेळी राजाची सुटका करण्यासाठी रंगो बापूजी पुढे आला. आणि काही निमित्ताने एलफिन्स्टनची गाठ घेऊन छत्रपतीच्या दैन्यावस्थेचे निवेदन त्याने साहेबास केले. आणि छत्रपतीला वाचविण्यासाठी मदतीचा याचना केली.
एव्हांना एलफिन्स्टने चिटणीसांनी सादर केलेल्या मराठ्यांच्या बखरीचे वाचन करून शिवशाहीचा परिचय करून घेतला होता. पण प्रत्यक्ष राजकारणात हस्तक्षेप करण्यापूर्वी सातारच्या किल्यावर नजरकैदेत असलेल्या प्रतापसिंहाची त्यासाठी संमती हवी होती. रंगो बापूजीने आव्हान स्वीकारले आणि रामदासी शिष्यांचा वेष धारण करून `जय जय रघुवीर समर्थ` अशी गर्जना करीत, अनेक हाल अपेष्टांना मारहाणीला तोंड देत महाराजांची गुप्तपणे भेट घेऊन साहेबाला हवे ते संमतीपत्र मिळविले. आणि त्याच्याकडून मदतीचे आश्वासन घेतले. आणि येथूनच रंगो बापूजीच्या कार्याचा शुभारंभ झाला. रावबाजीला याचा सुगावा लागला असावा कारण त्याने प्रतापसिंहाची साताऱ्याच्या किल्ल्यावरून उचलबांगडी करून वासोट्याच्या दुर्गम किल्ल्यांत त्याला कडेकोट बंदरास्तात त्याने डांबून ठेवले. हा सारा रोमहर्षकारक प्रसंग प्रबोधनकारांनी मोठ्या कौशल्याने रंगविला आहे.
रंगो बापूजीच्या प्रयत्नामुळे असेल अथवा आपल्या जासूसामार्फत राजाच्या छळासंबंधी मिळालेली माहिती एलफिन्स्टनला पटली असेल म्हणून असो, इंग्रज-मराठे संघर्षाला तेव्हापासून सुरुवात झाली. राजा इंग्रजाकडे जाऊ नये असे रावबाजीचे प्रयत्न आणि राजाला आपल्या बाजूला वळविण्याचे साहेबाचे प्रयत्न यांतून परस्परांचे संबंध बिघडत गेले. २८. ऑक्टोबर १८१७ रोजी बाजीरावाने आपल्या सैन्याची जमवाजमव गारपीरावर (आजचे ससून हॉस्पिटल) केली आणि इंग्रजांच्या रेसिडेन्सीवर चालून जाण्याचा दिवस निश्चित केला. पण सिद्ध झालेले सैन्य, जरीपटक्याची काठी मोडली, अपशकुन झाला म्हणून पुढे गेलेच नाही. बेसावध असलेल्या इंग्रजांची २८ ची काळरात्र टळली ते सावध झाले आणि जरीपटक्याची मोडलेली काठी मराठी राज्य मोडून बसली.
१८१७-१८ हा काळ प्रतापसिंहाच्या जीवनातील अत्यंत कसोटीचा काळ होता. रावबाजीने राजाला त्याच्या परिवारासह वासोट्यावरून बाहेर काढले आणि आपल्या युद्धछावणीत दाखल करून घेतले, आणि तो इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून आपल्याबरोबर रानोमाळ फरफटत नेले. पुढे युद्ध संपले. रावबाजीने शरणागती पत्करली. इंग्रजांनी राजाचा कब्जा घेतला, मोठ्या दिमाखाने त्याला साताऱ्यास आणले आणि तेथून पुढे नवे पर्व सुरू झाले.
प्रबोधनकारांनी समकालीन मराठी, इंग्रजी साधने विशेषतः पेशवे दफ्तर, मराठी दफ्तर, रुमाल प्रवासवर्णने, ऐतिहासिक कागदपत्रे, एलफिन्स्टनचे चरित्र आणि इतर इंग्रजी ग्रंथ यांचा तपशीलवार अभ्यास केला होता. याचा आपल्या ग्रंथात जागोजागी जे उल्लेख केले आहेत आणि आपल्या विधानांच्या पृष्ठ्यर्थ जी दीर्घ परिशिष्टे जोडली आहेत त्यावरून चांगलाच प्रत्यय येतो. प्रबोधनकारांपूर्वी हा विषय बी. डी. बसू, `स्टोरी ऑफ सातारा` कलकत्ता १९२२, आणि अॅडव्होकेट र. गो. राणे, सातारा, `छत्रपति प्रतापसिंह महाराज यांचे चरित्र` पुणे १९२९. या दोघांनी हाताळलेला होता, पण त्यांच्या निवेदनांना काही मर्यादा होत्या. प्रबोधनकारांनी त्या ग्रंथाहून अधिक तपशीलवार माहिती देऊन या विषयाला पूर्णत्व देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात १९४७ नंतर जी नवी साधने उपलब्ध झाली. ग्रंथ निर्माण झाले, त्याचा उपयोग करून घेऊन विद्यमान ग्रंथातील विषयाला पूरक अशा माहितीचा परिचय करून देणे आवश्यक वाटल्याने तसे करण्याचा प्रयत्न या प्रास्ताविकेत केला आहे.
प्रतापसिंहाला राज्य मिळाले, पण रंगो बापूजीला साताऱ्यात नोकरी दिली गेली नाही. प्रतापसिंह त्याला विसरला होता की काही हेतूने त्याला बाजूला ठेवले होते हे सांगणे कठीण आहे. प्रबोधनकार म्हणतात रंगो बापूजी उघडा राहिला (पृ. ४५) पण आपली सोय लावा असा त्याने `आक्रोश` केला नाही. सातारच्या नोकरीपेक्षा रंगो बापूजीने जाणूनबुजून कंपनी सरकारची नोकरी पत्करली असावी. कंपनीत राहून आपण राजाची सेवा चांगल्या रीतीने करू शकू अशी त्याची भावना असावी. कंपनी सरकार `नेटिवास` जवळ करीत असत त्यामागे त्यांचाही काही हेतू असावा. पेशव्यांच्या विरुद्ध बाळाजीपंत नातू आपणांस चांगला उपयोगी पडेल म्हणून एलफिन्स्टनने त्याला कंपनीच्या नोकरीत ठेवले होते, आणि त्याचा साहेबानी मराठी राज्याचा संपूर्ण नाश करण्याच्या कामी चांगला उपयोगही करून घेतला होता. रंगो बापूजी हा एलफिन्स्टनकडे प्रतापसिंहाची कैफियत घेऊन गेला तेव्हा छत्रपतीशी कंपनीची काही बोलणी चालली आहेत, ह्याचा सुतराम सुगावा बाळाजीपंताला लागू देऊ नकोस, असे त्याला बजावण्यात आले होते. कदाचित नातूच्या साताऱ्यातील कटकारस्थानांवर बारीक नजर ठेवण्यासाठीच रंगो बापूजीला कंपनी सरकारच्या सेवेत रूजू करून घेतले असावे.
१८१८ ते १८३९ या २१ वर्षांच्या कालखंडात साताऱ्यात जे जे घडले त्याचा साद्यंत वृत्तांत प्रबोधनकारांनी दिला आहे. त्यामुळे त्याविषयी अधिक लिहिणे येथे आवश्यक नाही. परंतु एलफिन्स्टनची या संपूर्ण प्रकरणांतील भूमिका. सातारचा पोलिटिकल एजंट आणि राजाचा एक सन्मित्र म्हणून कॅप्टन जेम्स ग्रँट याने निवृत्तीनंतरही राजाशी ठेवलेला ऋणानुबंध आणि बाळाजीपंत नातू याने सूडबुद्धीने वागून प्रतापसिंहाचा कसा छळ केला, यासंबंधी प्रस्तुत लेखकाला नव्या संशोधनाच्या आधारे जी काही माहिती त्यासंबंधी येथे अल्पसे विवेचन करावयाचे आहे.
सातारा राज्याची निर्मिती हा एलफिन्स्टनच्या खास राजनीतीची विजय होता असे सामान्यतः मानले जाते. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात दख्खन देशाचा कारभार करण्यासाठी कंपनी सरकारने माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन आणि थॉमस मन्रो या दोन माणसांची नेमणूक केली होती. यांपैकी पहिला राजनीतीज्ञ होता आणि दुसरे रणनीतीज्ञ. कंपनी सरकारची दक्षिणेत आणि पुढे सर्व देशावर सत्ता दृढमूल करण्यास या दोघांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. हे दोघेही मूलतः साम्राज्यवादी होते, पण इंग्रजांचे राज्य लोकांनी स्वीकारावे म्हणून त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी काही अंशी त्यांनी उदारमतवादी धोरणाचा पुरस्कार केला होता. मन्रो हा प्रामुख्याने सेनानी होता, आणि एलफिन्स्टनच्या राजकीय डावपेचाना त्याचा पूर्ण पाठिंबा होता. एलफिन्स्टनची `शेवटचा पेशवा` अशी तो संभावना करीत असे.
पेशव्याशी लढा देऊन कंपनीने जो मराठी प्रदेश जिंकला होता त्याची विल्हे कशी लावावयाची ही एक मोठी समस्या गव्हर्नर जनरल लॉर्ड हेस्टिंग्जपुढे होती. कंपनी सरकारपुढे दोन पर्याय होते- एक शिवाजीच्या वंशजाला एक छोटीशी जागीर देऊन त्याला स्वस्थ बसविणे आणि दोन राजाला जिंकलेल्या मराठी मुलखाचा विशेषतः नीरा-भीमा नद्यांमधला एक छोटासा प्रदेश बांधून देणे आणि त्याला मर्यादित स्वरूपाचे सार्वभौमत्व देणे, मर्यादित सार्वभौमत्व ही संकल्पना राज्यशास्त्राच्या कोणत्याही सिद्धांतात बसत नाही. सार्वभौमत्वाचे विभाजन म्हणजे सार्वभौमत्वाचे विनाशीकरण होय. साताऱ्यासाठी इंग्रजांनी ही खास राजनीती शोधून काढली होती. ब्राम्हणांनी बळकावले तरी मराठी सत्ता छत्रपतीच्या वंशजाला परत मिळवून देऊन मराठ्यांची सहानुभूती आणि पाठिंबा कंपनी सरकारला मिळवावयाचा होता.
इकडे ब्रम्हवृंदाला खूष करण्याकरिता आणि लिखापढी केलेले निष्ठावंत कारकून कंपनी सरकारला मिळावेत म्हणून श्रावणमाशी रमण्यात ब्रम्हवृंदाना जी दक्षिणा मुक्तपणे वाटली जात असे, त्याच दक्षिणेचा एक फंड बनवून त्यातून संस्कृत कॉलेजची (हेच पुढे पूना कॉलेज आणि नंतर डेक्कन कॉलेज बनले.) कल्पना निघाली आणि आपल्या उदारमतवादाचे प्रदर्शन करून त्याने ब्राम्हणांचा ही विश्वास संपादन करण्याचा आणि पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला. आणि त्याना देखिल ब्रिटिश राजवट हे ईश्वरी वरदान वाटू लागले. अशा या साम्राज्यवादी एलफिन्स्टनने इंग्लंडमधील समकालीन तत्त्वज्ञ जेरेमी बेंथॅम यांच्या `अधिकांचे अधिक सुख` या उदारमतवादाचा बुरखा घेऊन आपले मूळ साम्राज्यवादी स्वरूप झाकण्याचा प्रयत्न केला.
एलफिन्स्टने २५ सप्टेंबर १८१९ रोजी ११ कलमी तहनामा राजाबरोबर केला तो म्हणजे पुढे होणान्या सामीलनाम्याची पूर्वतयारी होती असे म्हणता येईल. विशेषतः करारातील २ आणि ५ या कलमानी राज्याच्या विलिनीकरणाचे सूतोवाच करून ठेवले होते. कलम २ म्हणते "इंग्रज- बहादूर याचे सरकारांतून जे राज्य देत आहे ते घेऊन सरकार इंग्रेज बहादूर यांचे कह्यांत व मदतीत निरंतर संतोषाने राहून सरकार इंग्रेज बहादूर यांचे सल्ला मसलतीने हरयेक काम करीत जाऊ" अशी नमनालाच भूमिका घेऊन कलम ५ मध्ये स्वच्छ इशारा दिला आहे की, "महाराज याचे सरकारातून काही तफावत पडल्यास या तहनाम्याचे रूईने (विचाराने) महाराज याचे सरकारास जो फाईदा आहे तो बरबाद होईल. राजाने बाहेरच्या माणसांना भरावयाचे नाही. पत्रव्यवहार करावयाचा नाही. लग्नास बाहेरगावी जावयाचे नाही, अथवा घरगुती कारणास्तव बाहेरच्या लोकांशी व्यवहार करावयाचा असेल तर तो इंग्रजांच्या मार्फत करावा अशी जाचक बंधने या कलमात होती. हेच मयादित सार्वभौमत्वाचे स्वरूप होते. ५ व्या कलमांत अशी सवलत दिल्याने जहागीरदारांचे फावले व राजाशी त्यांचा संघर्ष सुरू झाला आणि केवळ या ५ व्या कलमाचा आधार घेऊन रॉबर्ट ग्रँट या गव्हर्नरला राजाच्या पदच्युतीची कारवाई करणे सोपे झाले. हे सारे एलफिन्स्टनने मोठ्या धूर्तपणे केले होते."
१८१९ च्या या तहनाम्यास १८२६ साली एक चार कलमी पुरवणी जोडून परत एकदा १८१९ सालचा तहनामा बळकट करण्यात आणि राज्याच्या सीमांचा तपशील, सहा जहागीरदारांची नावे, राजाच्या खर्चाची तरतूद, यांचा पुनरुच्चार करण्यात आला होता. प्रतापसिंहाला असे वाटत होते की, आपल्या नोकराला म्हणजे बाजीराव पेशव्याला एकदा तडीपार केले म्हणजे त्याने गिळंकृत केलेला सर्व मुलुख इंग्रज आपल्या स्वाधीन करतील. पण हा सरळसोट व्यवहार इग्रजांच्या राजनीतीत बसत नव्हता. येथे एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की एलफिन्स्टनने शिवाजीच्या वंशजात रूढ झालेला `छत्रपति` ह्या किताबाचा प्रतापसिंहाच्या बाबतीत चुकूनसुद्धा कोठे उल्लेख केला नाही.
साताऱ्याचा पोलिटिकल एजंट म्हणून पेंटची नेमणूक केल्यावर त्याला दिलेल्या एका सूचनेत एलफिन्स्टन म्हणतो "राजाची प्रजा आणि स्वतः राजा यांच्या मनावर असे बिंबवावे की. सातारा राज्याच्या हद्दीतील खेड्या-खेड्यातून राजाचा झेंडा फडकविला असला, आणि तेथील रहिवासी हे जरी राजाचे प्रजाजन असले तरी, नावापुरते सुद्धा शिवाजीच्या साम्राज्याचे पुनर्जीवन करण्याचा इथे इरादा नाही." (it is not intended to revive even in name the empire of shivaji) ब्रिटीश सरकार हे सार्वभौम आहे हा विचार जर राजाने आत्मसात केला नाही तर आपण निर्माण केलेले हे सातारा राज्य एक दिवस आपल्यावरच उलटेल अशी धोक्याची सूचनाही त्याने ग्रँटला दिली होती. `छत्रपती` हा किताब साहजिकच इंग्रजी तहनाम्यात नाही पण त्याचा मराठीत तर्जुमा करताना लिपिकाने `छत्रपती` हा शब्दप्रयोग केला आहे.
एलफिन्स्टन हा साम्राज्यवादी असला तरी ब्रिटिशांचे साम्राज्य भारतावर किती काळ टिकेल याबद्दल त्याच्या मनात शंका होतीच. आपला मित्र जेम्स मॅकिनटोश याला १८१९ साली लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो की, "ब्रिटीश सरकार हे कालांतराने नष्ट होणार हे माझे विधान कोणत्याही पूर्वग्रहावर आधारलेले नसून निव्वळ तर्कावर आधारलेले (not prejudice, but reason) आहे" भारतीयांच्या शिक्षणासाठी प्रादेशिक भाषेतून तयार केलेल्या त्याच्या पुढे पडलेल्या पुस्तकांचा ढिगारा पाहून त्याचा सहकारी ब्रिग्ज त्याला हे सारे कशासाठी, असा सवाल करतो. त्यावर एलफिन्स्टन म्हणतो, एतद्देशीयांना शिकविण्यासाठी पण त्याचप्रमाणे आपल्याला युरोपला परत जाण्याचा मार्ग दाखविण्यासाठी. (To educate the natives, but it is high road back to Europe)
वास्तविक एलफिन्स्टन हा प्रतापसिंहाच्या राज्यकारभारावर खूष होता. साताऱ्याच्या एका भेटीत ग्रँट डफच्या तालमीत तयार झालेल्या या राजाच्या वाड्यातील खासगी खोलीला तो भेट देतो, त्या खोलीत टेबल-खुर्चीवर बसून शिवाजीचा हा वंशज कामकाज करतो याचा त्याला अचंबा वाटतो. आणि तो म्हणतो अशा प्रकारच्या शांततावादी वंशजाबद्दल त्याच्या पूर्वजाला (शिवाजीला) काय वाटले असते हे मला सांगता येणार नाही. (I do not know what his ancestor would think of so peaceful a descendent). राजाला देखील एलफिन्स्टनबद्दल आदर वाटत असे. एलफिन्स्टनच्या निरोप समारंभप्रसंगी जे मानपत्र त्याला देण्यात आले होते त्यावर पहिली स्वाक्षरी प्रतापसिंहाची होती. १८३६ पासून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जेव्हा राजाविरुद्ध कुभांड रचण्यास सुरुवात केली तेव्हा आपल्या २३ मार्च १८३७ च्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्स या कंपनी सरकारच्या सर्वश्रेष्ठ संस्थेकडे केलेल्या विनवणी पत्रात तो आपल्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एलफिन्स्टनचे मत मागवावे अशी विनंती करतो. ग्रँट डफने देखील १८३९ ते १८४९ असा सतत दहा वर्षे पत्रव्यवहार करून राजाचे निर्दोषित्व एलफिन्स्टनला पटविण्याचा प्रयत्न केला, पण त्याने या प्रश्नावर राजाच्या
बाजूने अथवा विरुद्ध असे कोणतेच मत ग्रँट आणि इतर ब्रिटिशांप्रमाणे का केले नाही हे एक न उकलणारे कोडे आहे. समजा एलफिन्स्टन या काळात भारतातच असता तर त्याने हे संकट टाळले असते का? का साम्राज्यवादी एलफिन्स्टनला जे होते आहे ते ठीकच आहे असे वाटत होते? का यांचे उत्तर आजपर्यंत तरी कोठे सापडले नाही. रंगो बापूजी त्याला कधी भेटलाच नाही काय? का त्याच्या प्रयत्नाला यशच आले नाही? एलफिन्स्टनने अशी विरक्ती आणि मौन का स्वीकारले होते?
या प्रकरणापाशी सुरुवातीपासून संबंधित असलेली दुसरी प्रमुख व्यक्ती म्हणजे कॅप्टन जेम्स ग्रँट. १८१८ साली प्रथम राजाला भेटला, आणि दिवसेंदिवस त्याचे ऋणानुबंध दृढच होत गेले.. राजाच्या पदच्युतीचे, वनवासाचे आणि शेवटी अवतार समाप्तीचे सर्वांत अधिक दुःख जर कोणा इंग्रजास झाले असेल, तर ते जेम्स ग्रँटला, असेच म्हणावे लागेल,
१८१८ च्या एप्रिल महिन्यात ग्रँटने साताऱ्याच्या राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली. एलफिन्स्टनच्या सूचनांप्रमाणे राज्यकारभार पाहिला. राजाला शहाणे करून सोडले. तहनाम्याचे काटेकोर पालन करणे आणि एलफिन्स्टन साहेबाची मर्जी संपादन करणे, कारण `मित्र म्हणून तो फार मोठा माणूस आहे, पण एकदा का जर तो संतापला, तर त्याच्या सारखा भयंकर माणूस नाही.` (great in friendship and terrible in wrath) याची जाणीव त्याला सतत करून देणे, इत्यादी कामे त्याने अक्कल हुशारीने पार पाडली, आणि १८२२ साली राजाकडे कारभाराची सर्व सूत्रे स्वाधीन करून तो १८२३ रोजी लंडनला परतला. राजा आणि ग्रँट हे समवयस्क होते आणि त्यामुळे त्या दोघांची चार वर्षांत चांगलीच मैत्री जमली.
सातारा राज्य, राजा आणि प्रजा यांच्या हिताची जाणीव त्याला होती हे त्याच्या उपलब्ध खाजगी पत्रव्यवहारावरून लक्षात येते. भारतातून निवृत्त होऊन येणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याकडे तो आवर्जून साताऱ्याची चौकशी करीत असे. १८२३ साली राजाला घाडलेल्या एका पत्रात तो म्हणतो "साताऱ्याविषयी सगळ्या चांगल्या गोष्टी ऐकण्यास मी उत्सुक आहे. जगातल्या कोठल्याही भागापेक्षा मला साताऱ्यात अधिक रस आहे." १८३० साली साताऱ्याचा रेसिडेंट रॉबर्टसन त्याला भेटला आणि म्हणाला "श्रीमंत महाराज आपले रयतेला बहुत सुंदर आणि योग्य आहेत. आपले राज्य मोठ्या दक्षतेने आणि उदारत्वे करून चालवितात व आपला देश सुरक्षित राखिला आहे. इतके असून कंपनी सरकारशी आक्रत्रिम स्नेह करून असतात.
याजप्रमाणे मी सदोदित अपेक्षा करितो की जे जे उत्तरोत्तर गवरनर जनरल तिकडे येतील त्यांनी आपली स्तुती बादशाहापाशी करावी, जीपासून मला जल्मबर समाधान होईल." (इंग्रजी पत्राचे मराठी भाषांतर पेशवे दप्त भाग ४२:४५) राज्यकारभाराविषयी सूचना देताना १८२८ च्या एका पत्रात तो राजाला लिहितो, "कार्यप्रवणता, सावधानता, काटकसर आणि उदारता ही तुझ्या कार्याची चतुःसूत्री असली पाहिजे." (Be active, vigilant, economical and liberal) सातारची प्रजा, शेतीव्यवसाय, शिक्षण इत्यादी विविध क्षेत्रांकडे आपल्या सेवानिवृत्तीनंतरही त्याने आपले लक्ष पुरविले होते. सातारा राज्य आणि राजा वाचले पाहिजेत असे त्याला सतत वाटत राहिले. "सातारा देश माझा खासगत असता तर इतके अगत्ये केले नसते, परंतु आपले देशाचे सर्वकाळ हित व्हावे" हीच त्याची भावना होती.
१८३९ ची राजाची पदच्युती आणि १८४८ साली झालेले सातारा राज्याचे विलीनीकरण यासंबंधीची आपली मते निर्भिडपणे एलफिन्स्टनला कळवून कंपनी सरकारचे कसे चुकले हे दाखवून देण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. साताऱ्याचा राजा आणि त्याचे राज्य हे अशारीतीने आपल्या डोळ्यादेखत नाहीसे व्हावे, आपण लावलेले रोपटे, जे डौलाने वाढत चालले होते ते असे एकाएकी उखडून टाकले जावे याची खंत त्याला शेवटपर्यंत लागून राहिली होती. (त्याचा मृत्यू २८ सप्टेंबर १८५८ रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी झाला) सातारा प्रकरणात ब्रिटिशाची वागणूक प्रामाणिकपणाची नव्हती याबद्दल त्याच्या मनात तिळमात्रही शंका नव्हती, असे असूनही आपली खासगी मते जाहीरपणे मांडण्याचे आणि रंगो बापूजीला मदत करण्यासाठी एलफिन्स्टन आणि ग्रँटसारखी माणसे पुढे का आली नाहीत हे समजत नाही. आणि त्याची खंतही वाटते.
प्रतापसिंह आणि ग्रँट यांची मैत्री असाधारण स्वरूपाची होती. कृष्णराव रामराव चिटणीस याने रचलेल्या समकालीन पद्यमय चरित्रांत म्हटले आहे, "ग्रांटसाहेब बडो धूर । सब राजनमो महशूर । उसे राजा प्रताप चतुर । मिलाय लिया अपनेमे ।। ग्रँट स्वतःला `मराठा माणूस` म्हणवून घेत असे. मराठ्यांचा संपूर्ण इतिहास त्याने लिहिला तो केवळ ज्या मराठ्यांपासून आपण भारताचे राज्य जिंकून घेतले ते मराठे कोण आहेत, हे साऱ्या युरोपला कळावे या हेतूने होय. त्यामुळे ग्रंथाच्या नामाभिधानात `मोगलांचा ऱ्हास आणि ब्रिटिश सत्तेचा उदय` हे जॉन मरे या प्रसिद्ध प्रकाशकाने सुचविलेल्या नामांतराचा धिक्कारकरून तो आपले हस्तलिखित परत घेऊन येतो, आणि या पुस्तकावर स्वतःचे सुमारे २००० पौंड खर्च करून लाँगमन कंपनीमार्फत प्रकाशित करतो. असा हा तडफदार ग्रँट सातारा प्रकरणात मूग गिळून का बसला होता? [ग्रँट डफच्या इतिहास प्रकाशनाबाबत प्रबोधनकारांनी जो तपशील दिला आहे. (पृ. ६८) त्यात थोडीशी दुरुस्ती हवी. पाहा. प्रस्तुत लेखकाचा ग्रँट डफ हा ग्रंथ (पृ. १९६-२०५)]
१८३५ पर्यंत सारे काही ठीक होते. ग्रँटनंतर आलेले रेसिडेंट कॅ. ब्रिग्ज (१८२३-२६). कॅ. रॉबर्टसन (१८२७-३२) आणि लॉडविक (१८३२-३७) यांनी ग्रँटडफचा दस्तुरचं चालू ठेवला होता, आणि त्यामुळे राजाविरुद्ध तक्रार करण्यास कंपनीस काहीच जागा नव्हती. कोर्ट ऑफ डायरेक्टर्स या कंपनीच्या उच्च अधिकार संस्थेनेदेखील २९ डिसेंबर १८३५ च्या पत्रान्वये राजाची प्रशंसा करणारे पत्र आणि एक तलवार नजर केली होती, पण प्रत्यक्षात मुंबईचा गव्हर्नर आणि राजाचा दुष्मन रॉबर्ट ग्रँट याने ते सारे राजापर्यंत पोहोचणार नाही याची दक्षता घेतली होती. अशा या सद्गुणी राजाच्या पदच्युतीची (१५ ऑक्टोबर १८३९) बातमी जेव्हा ग्रँटला कळली तेव्हा ताबडतोब आपल्या ८ जानेवारी १८३९ च्या पत्रात तो एलफिन्स्टनला लिहितो, "राजाला पदच्युत करणे आम्हाला भाग पडावे याची मला कीव येते. प्रतापसिंहासारख्या माणसाला पदच्युत करून हे राज्य खालसा करण्यापेक्षा कंपनीने आपल्या प्रतिष्ठेचा काहीसा त्याग करणे शहाणपणाचे ठरले असते, आणि हिंदुस्थानभर पिकणाऱ्या कंड्यांपासून आपला बचाव झाला असता."
प्रतापसिंहाच्या कृत्याचे समर्थन करताना तो म्हणतो, "मुंबईचा गव्हर्नर माल्कम किंवा साताऱ्याचा रेसिडेंट रॉबर्टसन यापैकी कोणीही तहनाम्याच्या ५ व्या कलमाचे उल्लंघन होत असल्याचे राजाच्या निदर्शनास आणून देऊ शकला नाही, आणि त्यांच्या हातून घडले ते त्यांच्या अविवेकी दयाळूपणा (injudicious kindness) मुळेच होय. (१०-२-१८४०). प्रतापसिंहाच्या पदच्युतीमुळे तो इतका बेचैन झाला होता की, "आज ५ जून १८४० रोजी मी अशी प्रतिज्ञा करितो की, महाराज प्रतापसिंहासंबंधी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष असा एकही प्रश्न मी विचारणार नाही. बिचारा महाराजा" असे पत्राने एलफिन्स्टनला कळविल्याशिवाय त्याला राहवले नाही, असे असूनही गप्प बसावे असे त्याला का वाटले? १८४० ते १८४९ या कालावधीत एलफिन्स्टनशी झालेल्या पत्रव्यवहारात साताऱ्याविषयी त्याने काहीही लिहिलेले आढळत नाही. कदाचित एलफिन्स्टननेच त्याला हा विषय बंद करण्यास सांगितले असावे.
पण १८४८ साली इंग्रजांनी सातारा राज्य खालसा केल्याचे वृत्त त्याला जेव्हा कळले तेव्हा आपल्या प्रतिज्ञेचा भंग करून तो १० जानेवारी १८४९ रोजी एक शेवटचे दीर्घ पत्र लिहितो. तो म्हणतो, "शिपायांना फूस लावणे व गोवा सरकारशी संगनमत करणे हे आरोप पूर्णतया बनावट आहेत अशी माझी खात्री आहे. मी सारा पुरावा वाचला आहे. त्या माणसाचे चारित्र्य त्याच्या गुणदोषासह मला पूर्ण ज्ञात असल्याने मी असे विधान करू शकतो. मुंबईचा गव्हर्नर रॉबर्ट ग्रँट म्हणतो त्याप्रमाणे राजा दोषी आहे असे जरी आपण गृहीत धरले तरी ज्या पद्धतीने सर जेम्स कारनॅक याने राजास पदच्युत केले ती पद्धती अन्यायाची होती. राजाचे हक्क अबाधित राखण्याची तहनाम्यात पूर्ण तरतूद होती, आणि त्याच्या हातून काही कमीजास्त घडले असते तर ती आमची चूक ठरली असती. अर्थात राजाने ब्रिटिश सत्तेला विरोध करण्याचा दृढ निश्चय केला असता तर त्याचे सार्वभौमत्व कायमचे नष्ट झाले असते. अशा परिस्थितीत ब्रिटिश मुत्सद्यांनी साध्या आणि सरळ प्रामाणिकपणाच्या मार्गाशिवाय दुसऱ्या कोणत्याही विचाराचा प्रभाव आपल्या धोरणावर होऊ द्यावयास नको होता."
दत्तक विधानासंबंधी जो वाद निर्माण झाला होता त्या बाबतीत ग्रँटचे म्हणणे असे होते की, प्रतापसिंहाने घेतलेली दोन्ही दत्तके हिंदुशास्त्रानुसार कायदेशीर होती, पण ती तशी आहेत असे मानण्याच्या मनःस्थितीत ब्रिटिश अधिकारी नव्हते. कारण त्यांना राज्य खालसा करण्याची घाई झाली होती. प्रतापसिंहाने ज्याला दत्तक घेतले होते त्याला मान्यता दिलीच पाहिजे असे आपले ठाम मत या पत्रात त्याने व्यक्त केले आहे. राजाला दोषी ठरविण्यापूर्वी आपण तरी कराराचे पालन केले आहे का याचा अधिकाऱ्यांनी विचार करावयास हवा होता. राजाच्या भावाला गादीवर बसविणे हे या तहातील अटीशी विसंगत आहे, तसेच ब्रिटिश सरकार साताऱ्याचा सर्व मुलुख आपल्याकडे घेऊ शकत नाही. आप्पासाहेबाच्या दत्तकाला मंजुरी देणे शहाणपणाचे नाही इत्यादी अनेक गोष्टी, ज्या प्रतापसिंहाचा पाठपुरावा करणाऱ्या होत्या त्या तो केवळ स्वतःच्या समाधानासाठी एलफिन्स्टनला कळवितो आणि स्वस्थ बसतो; जाहीर उच्चार करीत नाही.
ग्रँटनंतर साताऱ्याचा रेसिडेंट म्हणून कॅ. जॉन ब्रिग्ज याची नेमणूक झाली. राजाच्या वृत्तीत थोडासा फरक पडत चालला आहे असे त्याला वाटू लागले होते. शेजारच्या कोल्हापूर संस्थानाला जे स्वातंत्र्य आहे तसे आपल्याला मिळावे. सत्तांतरानंतर पूर्वीच्या तहनाम्यांत बदल व्हावा असे त्याला वाटणे स्वाभाविकही होते. आपले राजाविषयीचे मत ब्रिग्जने अधिकृत रीत्या सरकारकडे पाठविले नाही. पण आपली नाराजी व्यक्त करणारे एक गोपनीय पत्र ८ ऑक्टोबर १८२६ रोजी एलफिन्स्टनला लिहिले आहे. विठ्ठलपंत दिवाणाच्या मृत्यूनंतर ज्याला लिहिता वाचता येत नाही अशा बाळासाहेब नावाच्या एका आपल्या मर्जीतल्या व्यक्तीला दिवाणपदी नेमले हे ब्रिग्जला आवडले नाही, राजाच्या वर्तनात काही सुधारणा झाली नाही.
आपण स्वतंत्र आहोत. तहनामा बंधनकारक नाही. रेसिडेंटची जरूरी नाही असे तो जे जाहीरपणे बोलतो. तसेच कोल्हापूरकराशी संबंध जोडण्याची त्याची तीव्र इच्छा सफल झाली तर सातारा राज्याचा कारभार आपल्या हाती परत घ्यावा लागणार असे ब्रिग्जने आपल्या पत्रात सूचित केले आहे. आपली मुदत संपत आली आहे, आणि या साऱ्या प्रकरणांतून आपली लौकरच सुटका होणार आहे याचा आनंदही तो येथे व्यक्त करतो. आपण राजाविरुद्ध अधिकृत तक्रार करीत नाही असे ब्रिग्ज म्हणतो त्यावरून त्याचा आशावाद व्यक्त होतो, आणि सारे काही ठीक होईल असेच त्याला वाटत असावे असे दिसते.
ग्रँटसारखे राजाने ब्रिग्जशी मैत्रीचे संबंध ठेवले नाहीत याचे कारण त्याला इंग्रजाचा स्वभाव कळला नाही, त्याचे सारे आडाखे चुकले असे ब्रिग्ज एलफिन्स्टनच्या एका पत्रात म्हणतो. (१२ नोव्हेंबर १८२६) तो पुढे असेही म्हणतो की त्याच्या अव्यवहारीपणामुळे तो माझ्या मनातून उतरला आहे. पण त्याचा निरोप समारंभ मोठ्या सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला. राजाने दिलेली भेट हिऱ्याची आंगठी, त्याने प्रेमाने स्वीकारली. असे सर्व ठीकठाक असले तरी पण सातारा सोडण्यापूर्वी त्याने मुंबई सरकारला जो एक विस्तृत अहवाल सादर केला आहे त्यात त्याच्या राज्यकारभाराची भलावण केली आहे पण नजिकच्या माणसावर देणग्यांची खैरात करणे, कोणावर विश्वास न ठेवणे आणि इतर काही बाबींसंबंधी खंतही व्यक्त केली आहे. शेवटी त्याने असा इशारा दिला आहे की, राजाला वेळीच जागे करणे, त्याला ताकीद देणे हे त्याच्या हिताचे आहे, राजा एखाद्या कारस्थानात अडकला की त्याच्यावरचा आमचा विश्वास नष्ट होईल, आणि त्याचा नाश होईल. (१ जानेवारी १८२७)
राजा कोणत्या कारस्थानात गुंतला असेल या ब्रिग्जच्या विधानावर एलफिन्स्टनचा विश्वासच बसत नाही. ब्रिटिश सरकार उलथून पाडण्याच्या कोणत्याही कटात राजा असणार नाही असे त्याला वाटत होते. पण राजाबद्दल काही विश्वसनीय आणि निश्चित बातमी असेल तर मात्र त्याला ताकीद दिली पाहिजे असे तो प्रभारी रेसिडेंट सिम्पसन यास कळवितो (१९-२-१८२७) आणि या बातमीने थोडेसे जरी काही तथ्य असेल तर `आपल्यावर सरकारचा विश्वास नाही अशी त्याची भावना होऊ देऊ नका, फक्त सौम्य ताकीद प्रथम द्या, पक्का अधिकृत पुरावा हाती आल्याखेरीज कारस्थानाविषयी काही बोलू नका` असे तो सिम्पसनला बजावतो. (६ मार्च १८२७) राजाविषयी विनाकारण प्रतिकूल मत करून घेतले आहे. अशी भीती त्याला वाटते म्हणून तो त्याला लिहितो.
`राजा कारस्थानात गुंतलाच असेल, तर त्याला दिली जाणारी शिक्षा अगदी सौम्य असेल` (७ मार्च १८२७). यावर, सकृतदर्शनी राजा जरी गुंतलेला वाटत असला, तरी आता लगेच त्याला काही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही` असे सिम्पसन एलफिन्स्टनला आश्वासन देतो (९ मार्च १८२७). ऑक्टोबर १८२७ मध्ये एलफिन्स्टनने मुंबईचा निरोप घेतला; जॉन मालकम हा १ नोव्हेंबर १८२७ रोजी त्याच्या जागी रूजू होणार होता. २९ ऑक्टोबर १८२७ रोजी एलफिन्स्टनने राजाला निरोपाचे आणि एक प्रकारे शेवटचे पत्र लिहिले. त्यात त्याने राजाचे आभार मानले आहेत, राजाने दिलेल्या त्याच्या राजघराण्याच्या शकावलीचा आदरपूर्वक स्वीकार केला आहे. राजाचे भावी आयुष्य सुख समृद्धीचे जावो असे अभिष्टचिंतन केले आहे. त्याच्या मैत्रीची आठवण आपण सतत ठेवू, नव्या रेसिडेंटबद्दल-रॉबर्टसनबद्दल राजाने काढलेले धन्योद्गार आणि राजाने उदारहस्ते २५ हजार रुपयांची एलफिन्स्टन प्रोफेसरशिपसाठी दिलेली देणगी याचा आवर्जून उल्लेख केला आहे.
असे असताना लंडनला गेल्यावर त्यांचे मतपरिवर्तन झाले का, अथवा ब्रिग्जच्या गोपनीय पत्राचा, अहवालाचा त्याच्या मनावर परिणाम झाला आणि या प्रकरणात आपण तोंड उघडावयाचे नाही अशी शपथ त्याने घेतली होती, आणि म्हणून हे सारे उघड्या डोळ्यांनी तो तटस्थपणे पहात राहिला होता. अँटच्या बेचैनीने लिहिलेल्या पत्रांना तो प्रतिसाद देत नव्हता. रंगो बापूजीशी तो संबंध ठेवत नव्हता. सप्टेंबर १८४१ रोजी साताऱ्याच्या काही मुसलमान सेवकांनी पाठविलेल्या पत्राची (हे दीर्घ मोडी पत्र इंडिया ऑफीस लायब्ररीत आहे) तो दखलसुद्धा घेत नाही. हे सारे काही गूढ वाटते.
एलफिन्स्टन आणि ग्रँट डफ या दोघांपेक्षा ब्रिग्ज मात्र निराळा होता. साताऱ्यात असताना राजा त्याच्या मनातून उतरला असला तरी राजावर झालेला अन्याय त्याला सहन झाला नाही. रंगो बापूजीने आणि इतर ब्रिटिश सद्गृहस्थांनी जेव्हा झाला प्रसंग त्याच्या निदर्शनास आणला. तेव्हा या प्रकरणात त्याने हिरीरीने भाग घेतला, पार्लमेंटमध्ये भाषण करून राजाची बाजू प्रभावीपणे मांडली आणि रंगो बापूजीशी असलेल्या आपल्या मैत्रीचा जाहीर उच्चार केला. प्रबोधनकारांनी त्याचे समर्थ निवेदन आपल्या ग्रंथात दिले आहे. (पृ. २११-२१२), आपल्या आठवणीच्या ग्रंथात तो म्हणतो, `साताऱ्यात मी जेव्हा होतो, तेव्हा राजाला आपला कारभार सांभाळण्याचे सर्वाधिकार दिले होते, आणि तो त्यांचे एलफिन्स्टनने दिलेल्या सूचनाप्रमाणे काटेकोरपणे पालन करीत होता, त्यात थोडीही कसर तो करीत नव्हता. तो धूर्त होता. आपल्या देशबांधवात असलेल्या पुष्कळशा गैरसमजुतीपासून मुक्त होता; न्याय आणि नैतिकता यासंबंधी त्याच्या काही ठाम कल्पना होत्या, आणि त्यामुळे खोटेपणा करण्याची त्याच्यापासून तिळमात्रही अपेक्षा करता येणार नाही.`
सातारा प्रकरणांतील ग्रँट डफ, एलफिन्स्टन आणि ब्रिग्ज यासंबंधित ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या भूमिका समजावून घेतल्यानंतर, या प्रकरणाला विशिष्ट वळण लावणाऱ्या बाळाजीपंत नातू याच्या कारस्थानाचा आपणास थोडक्यात परामर्ष घ्यावयाचा आहे. "पाचवडच्या एका भिक्षूक भटाचे पोर ते काय, आणि राज्यक्रांतीच्या काळात स्वदेशी मुत्सद्यांच्या नाकात वेसणी घालून त्याना आपल्या धोरणावर नाचवते काय?" असा सवाल करून प्रबोधनकारांनी या खलपुरुषाचे कपटकारस्थान विस्तृतपणे मांडले आहे.
पेशव्यांच्या फडात कारकुनी मिळाली नाही म्हणून पेशव्यांचे शत्रू इंग्रज यांच्या नोकरीत तो सामील झाला, आणि त्याच कारणावरून प्रतापसिंहानेदेखील त्याला आपल्या सेवेत दाखल करून घेण्यास इंग्रजांना संमती दिली. वास्तविक बाळाजीचा उपयोग जसा एलफिन्स्टनने बाजीरावाविरुद्ध करून घेतला, तसाच त्याला साताऱ्याबाबतही पुढे मागे जरूर पडल्यास होईल. असे त्याला वाटत असावे. प्रतापसिंहाची सुटका करण्यास आपण मदत करू असे आश्वासन देताना एलफिन्स्टनने रंगो बापूजीला अगदी बजावून सांगितले होते की, चुकूनसुद्धा ही गोष्ट बाळाजीला समजता कामा नये. एलफिन्स्टनने पुढे मोठ्या धूर्तपणे बाळाजीची नेमणूक ग्रँटचा सहायक म्हणून केली, आणि इंग्रजांना सातारच्या राजघराण्याशी उद्भवलेल्या समस्या सोडविण्यास त्याची खूप मदत झाली. प्रथम त्याने माईसाहेबांची समजूत काढून आपल्या मुलांचा मार्गदर्शन करण्याचा म्हणजेच पर्यायाने `रीजंट` बनण्याचा विचार त्यांच्या डोक्यातून कावून टाकला. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तनख्याचा. राजाची मागणी ३० लाखांची होती पण बाळाजीच्या मध्यस्थीने ग्रँटने ती साडेतीन लाखांवर मिटवली. बाळाजीपंताने ग्रँटला एकदा सांगितले की, "शाहू महाराजांनी हे राज्य एका ब्राह्मणाच्या स्वाधीन केले हा फार मोठा शहाणपणा केला नाहीतर मराठी साम्राज्य यापूर्वी केव्हाच लयास गेले असते." (४-५-१८१८)
४ मार्च १८१८ रोजी बाळाजीपंत साताऱ्यास प्रथम प्रतापसिंहाशी बोलणी करण्यासाठी एलफिन्स्टनबरोबर गेला होता. त्याकामी त्याने केलेली मदत पाहून ग्रँटचा मदतनीस, चीफ नेटिव्ह एजंट म्हणून द. म. ५०० रु. वर त्याची नेमणूक झाली होती. सुरवातीस राजास तो इंग्रजाशी बोलणी करण्यास फार उपयुक्त आणि विश्वासार्ह वाटत होता. ग्रँटने लौकरच नातूची चाल ओळखली. आणि राजाला आणि त्याच्या कुटुंबियाना त्याने स्पष्टपणे इशारा दिला की, त्यांना जी काही बोलणी करावयाची असतील ती फक्त त्याच्याशीच करावीत, बाळाजीच्या मध्यस्थीने नाही.
राज्यकारभारातील त्याचे महत्त्व तर कमी करावयाचे असा बेत ग्रँटने आखला. मराठ्यांच्या इतिहास लेखनाच्या कामी साधन सामुग्री, विशेषतः प्रतापसिंहाकडील ऐतिहासिक कागद मिळविण्यासाठी त्याने खूपच मदत केली. चिटणीस कागद देत नाहीत असे पाहून बाळाजीने मोठ्या आर्जवी स्वरात राजास विनंती केली. "सारे कागद पाहून छाप्यात छापून विलायतेस जाईल. सर्वास महाराजांचा पराक्रम, राज्ये वगैरे जाहीर होईल." त्याने बाळाजीकडून मराठ्यांच्या इतिहासाची बखर लिहून घेतली होती, आणि त्याचे इंग्रजी भाषांतर मॉरिस या त्याच्या सहकाऱ्याने केले होते. या दोन्ही ग्रंथांचा प्रस्तुत लेखकाने खूप शोध घेतला, पण यश आले नाही. इंग्रजांच्या दृष्टिकोनातून बाळाजीने इतिहास कसा लिहिला असेल हे पाहणे ठरले असते.
इतिहास लेखनाचा मतलब साध्य झाल्यानंतर क्रमशः ग्रँटने त्याची साताऱ्यातून उचलबांगडी करण्याच्या कामास सुरवात केली होती. पण हे काम काहीसे कठीण होते. कारण तो एलफिन्स्टनच्या मर्जीतला होता. केवळ ग्रँटचा मदतनीस म्हणून त्याला साताऱ्यात रहावयाचे नव्हते, तर त्याला प्रतापसिंहाचा दिवाण बनावयाचे होते. आपल्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण त्याने दिले होते. त्या पत्रात तो म्हणतो, "साहेबाचे कदम मुबारक होऊन कार्य सिधीस जाई ते जाहाले पाहिजे. लोखंड परसास लागल्यावर सोने होईल की नाही ही काळजी लोखंडास राहात नाही. माझे मनात काय आहे ती येते वेलेस विनंती केली आहेच." (२१-५-१८१८) पण याचा काही फारसा उपयोग झाला नाही.
बाळाजीस पूर्वी एलफिन्स्टनने पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांतील गावे इनाम दिली होती, आणि आता कोल्हापूरकराकडूनही त्याला दोन गावे इनाम मिळणार होती त्यालाही ग्रँटचा सल्ला न स्वीकारता एलफिन्स्टनने ती घेण्याची परवानगी दिली होती. बाळाजी हा रास्ते यांचा वकील होता व त्यासाठी आपणास पुण्यास जाण्यास तो ग्रँटकडे परवानगी मागे पण रास्ते प्रकरणात बाळाजीने पुण्यास येण्याची आवश्यकता नाही हे एलफिन्स्टनने मान्य केल्याने ग्रँटला धैर्य आले. आणि त्याच्यावर कारवाई करण्यास तो सिद्ध झाला.
बाळाजी हा प्रामाणिक नाही, तो लोकाकडून लाच घेतो या बाबतीत त्याची पक्की खात्री झाली होती. ग्रँटने एकदा त्याची परीक्षा घेण्याकरिता त्याला सरळ विचारले की, बापू आपटे नावाच्या एका इसमाकडून सदाशिव जोशी नावाच्या इसमाने तुला तीन हजार रुपये दिले का? त्यावर बाळाजीचे उत्तर असे की, जोशी जेव्हा पैसे घेऊन आला तेव्हा आपण त्यास म्हणालो. "या पैशाला मी हात लावला तर गोमांस भक्षण केल्याचे पातक माझ्या हातून घडेल, हे पैसे तू परत घेऊन जा." या उत्तरावर ग्रँटचा विश्वास बसणे शक्य नव्हते. ग्रँटने घडला प्रसंग एलफिन्स्टनला सविस्तर कळविला बाळाजीला त्याला भेटण्याची परवानगी नाकारली.
बाळाजीला सारे चित्र स्पष्ट दिसू लागले. राजा, त्याचे सहकारी, आणि आता खुद्द ग्रँट साहेबही आपल्या विरुद्ध झाल्याचे पाहून आपल्याला साताऱ्याच्या सेवेतून मुक्त करावे अशी विनंती त्याने ग्रँटला केली. कंपनी सरकार इतरत्र जे काम देईल ते आपण करू, नाही तर काशीस जाऊ असेही तो म्हणाला बाळाजीने आपले स्थान टिकविण्याचे खूप प्रयत्न केले, पण "राजाचे तोंडही पहाणार नाही" असे म्हणणाऱ्या आणि परत आपले चुकले असे कबूल केले तरी बाळाजीला शेवटी ४ नोव्हेंबर १८१९ रोजी ग्रँटने निरोप दिला. वास्तविक बाळाजीपंताला इतक्या तडकाफडकी काढून टाकले हे प्रतापसिंहालाही मान्य नसावे. त्याच्या रोजनिशींतील एक नोंद सांगते, "आमी ब्राह्मण लोक सारे पाहिले, परंतु बालाजीपंताप्रमाणे कोणी नाही शाहणा. मग आणखी बोले ग्रांट की दोन तीन काम वाईट खुनसी व राग मनी धरून ठेवणे त्याचे छातीवर चढणे."
प्रतापसिंहाला माणसाची जी पारख करता आली नाही, ती ग्रँटने बरोबर केली होती. प्रतापसिंहाच्या एका अप्रकाशित कैफियेतीत म्हटले आहे "नातू याचे मनात आपण इकडील कारभार करावा व आम्ही त्याचे जरबेत असावे असे येऊच नातू हे इकडील मंडळीपासी उगीच जिकिर करू लागले." ही कैफियेत काशीच्या वनवासांत लिहिली असावी. बाळाजीपंत साताऱ्यात परत आला तो आप्पासाहेबाचा दिवाण म्हणूनच राजाच्या पदच्युतीचा त्याला इतका आनंद झाला होता की, त्याने लगेच एलफिन्स्टनला पत्राने कळविले, "राजाने अशा प्रकारे नियमबाह्य वर्तन करण्यास प्रारंभ केल्यावर त्याचे राज्य टिकेल असे अपेक्षिणे कठीण होते. पण ब्रिटिश सरकारच्या औदार्यामुळे व दयाळूपणामुळे हे राज्य त्याच्या घराण्यांतच राहिले ही अत्यंत समाधानाची बाब असून तीमुळे सरकारचा मोठा नावलौकिक झाला आहे." (२५-१०-१८३९) ग्रँट डफला जेव्हा बाळाजीच्या साताऱ्यातील पुनरागमनाची वार्ता कळली तेका तो म्हणतो, बाळाजीपंतास साताऱ्यास पंतप्रधान म्हणून राहू दिल्यास ब्रिटिश सरकारवर मोठा ठपका येईल, सातारा राज्य खालसा होण्यास, आणि रंगो बापूजीच्या कार्यात अडथळे निर्माण करण्यास बाळाजीने जी कुटिल कारस्थाने केली त्याचा साद्यंत वृत्तांत प्रबोधनकार ठाकरे यांनी दिला असून सातारा प्रकरणात बाळाजीपंत नातू कसा प्रमुख आरोपी होता हे तपशीलवार सिद्ध केले आहे.
प्रतापसिंहाच्या पदच्युतीसंबंधी `प्रभाकर` सारख्या मराठी वृत्तपत्रातून आणि `लोकहितवादी` सारख्या सुधारकांच्या लिखाणातून, तसेच देशी, परदेशी इंग्रजी वृत्तपत्रांतून आलेल्या वृत्तांताचा प्रबोधनकारांनी आपल्या ग्रंथांत उल्लेख केला आहे. १८४३ च्या सुमारास रामकृष्ण विश्वनाथ या विचारवंताने लिहिलेल्या `हिंदुस्थानची प्राचीन व सांप्रतची स्थिती व पुढे काय त्याचा परिणाम होणार याविषयी विचार` या ग्रंथाचा येथे उल्लेख करावा लागेल. प्रस्तुत ग्रंथात देशी संस्थाने हडप करण्याच्या कंपनी सरकारच्या राजनीतीचे संहारक स्वरूप प्रगट करताना लेखकाने गुजरातेतील `निंबोरी` आणि महाराष्ट्रातील `सातारा` या दोन संस्थानांत ब्रिटिशांनी घातलेल्या गोंधळाची माहिती दिली आहे. लेखक म्हणतो, "दुसरा कब्जा (पहिला निंबोरीचा) ज्यामध्ये कंपनी सरकारची राज्यनीतीची वर्तणूक उघड दिसती तो सातारचे राजाचा आहे.
या राजास पदच्युत करून त्याचा इन्साफ न करिता व त्याचे अपराधाचा काही दाखला नसता व जरी याचा निरपराधीपणा स्थापन करण्यास पुष्कळ आधार होता. तरी त्यास कैद करून काशीस पाठविला." असे म्हणून १८४३ पर्यंत जे काही घडले ते थोडक्यात दिले आहे. राजाचे चारित्र्य हनन करण्यासाठी "मुंबई सरकारने एक आंग्ल युवती मिसेस लाडार हिला राजास मोहित करण्यासाठी पाठविले होते, पण राजाला त्याच्या मित्रांनी या वेश्येपासून सावध राहण्याचा वेळीच इशारा दिला होता. राजाचा कोणतेही प्रकारे नाश करावा हाच या मागे हेतू होता हे सिद्ध होते. पुढे १८४१ च्या `मुंबई टाईम्स` मध्ये यासंबंधी एक मोठा व निरर्थक वृतांत लिहिला आहे." प्रबोधनकारांनी नूस पेपरात गैरवाका मजकूर (पृ. १०१) या शीर्षकाखाली जी त्रोटक माहिती दिली आहे ती कदाचित या टाईम्समधील वृत्तांतांसंबंधी असावी. (पाहा. रामकृष्ण विश्वनाथ, पृ. ३०)
रंगो बापूजीचे सारे कर्तृत्व प्रतापसिंहाशी निगडित असल्याने त्याचे चरित्र म्हणजे १८०८ ते १८४८ पर्यंतचा सातारा प्रकरणाचा इतिहास असेच म्हणावे लागेल. त्यामुळे त्याच्या चरित्रकथनात प्रामुख्याने प्रतापसिंह आणि त्याचा काळ याचाच वृत्तांत येणे अपरिहार्य आहे.
रंगो बापूजीने कंपनी सरकारची नोकरी १८३१ साली सोडली. १८१८ ते १८३१ या कालखंडात प्रतापसिंहाला आपल्या या स्वामीनिष्ठ सेवकाची आठवण झालेली दिसत नाही. पण एलफिन्स्टन, ग्रँट, ब्रिग्ज, रॉबर्टसन या मित्रांचे प्रेमळ छत्र नाहीसे झाले, आणि त्याच्या विरोधकांनी जेव्हा त्याच्याविरुद्ध तुफान उठविले तेव्हा १८१८ पूर्वीच्या या आपल्या सेवकांची राजाला एकदम आठवण झाल्याचे दिसते. कारण मुंबईत राजाचा एजंट म्हणून त्याने काम करावे आणि साताऱ्यात जे घडत होते त्याची कल्पना मुंबई आणि कलकत्ता येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी, विशेषतः तहनाम्यातील कलम ५ चा आधार घेऊन जहागीरदारांनी राजाशी जो संघर्ष मांडला होता आणि समस्या निर्माण केली होती ती कायमची धसास लावावी यासाठी प्रयत्न करण्याचे काम त्याच्याकडे सुपुर्द केले होते. विशेषतः कंपनीचे निवृत्त आरोग्याधिकारी डॉ. मिल्न यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यामार्फत राजाची बाजू वरिष्ठापुढे मांडावी व त्या दृष्टीने हालचाली कराव्यात असे त्यास सांगितले होते.
तसेच इंग्लंडमधील कंपनीच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनाही सत्य कळणे आवश्यक होते. रंगोबाने त्यासाठी सय्यद मीर आफजल अली यास राजाचा वकील म्हणून पाठविण्याचे ठरविले. कंपनीचे अधिकारी या बाबतीत काय अडचणी निर्माण करतील याचा पूर्ण विचार करून या वकिलाला १८३७ साली मक्केच्या यात्रेचे निमित्त करून बाहेर काढले. पण त्याला विशेष यश आले नाही, तो परत आला. राजाने यशवंतराव शिर्के यांना १८३८ साली लंडनला पाठविले. मुंबईत रंगो बापूजीच्या हालचाली जोरात सुरू होत्या. त्याने जगन्नाथ शंकरशेट, जमशेटजी जिजीभाई इत्यादींच्या गाठीभेटी घेतल्या, आणि मदतीची याचना केली. यशवंतराव शिर्क्याने पैशाचे आमिष दाखवून बोर्डापुढे राजाचा अर्ज दाखल करून घेतला. पण एवढ्यात आपला धनी पदच्युत झाल्याचे त्याला कळले आणि तो निराश झाला. प्रतापसिंहाची बाजू इंग्लंडामध्ये बिग्ज, लॉडविक, रॉबर्टसन या निवृत्त अधिकाऱ्यांनी मांडली, पण पदच्युतीला तहकुबी द्यावी ही त्यांची मागणी बहुमताने फेटाळली गेली. ग्रँट डफ आणि एलफिन्स्टन यात सामील झाले नव्हते याचे कारण समजत नाही.
रंगो बापूजी अनेक अडचणींना तोंड देत, कॅप्टन कोगन या निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्याचे आर्थिक सहाय्य घेऊन, वेषांतर करून आरबी व्यापाऱ्यांच्या काफिल्याबरोबर १८४० च्या जून अखेर लंडनमध्ये दाखल झाला. पण सर्व मार्ग खुंटल्याने तो यशवंतराव शिर्क्याच्याबरोबर १ जुलै १८४१ ला भारत परतीच्या प्रवासात दाखल झाला. भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी, इंग्रज अधिकाऱ्यांचा उद्दामपणा, न्यायी म्हणवणारे इंग्रज अर्ज विनंत्यांना दाद देणारे नव्हते याचा मराठी माणसांना चांगला प्रत्यय आला होता, त्यामुळे माघारी फिरण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. अस्वस्थ मनाने तो बोटीवर चढला. पण माल्टा येथे तो बोटीतून उतरला, आणि त्याचे साथीदार पुढे गेले. `सरकार स्वारी परत सातारला येईपर्यंत मी स्वदेशाला तोंड दाखवणार नाही` अशी त्याने घोर प्रतिज्ञा केली होती. अशी प्रखर स्वामी निष्ठा रंगो बापूजी जवळ होती. प्रबोधनकार म्हणतात त्याप्रमाणे तो `निराशा प्रभू` होता. जॉर्ज थॉमसनच्या मध्यस्थीने त्याने सतत आठ वर्षे `छत्रपती बचाव` चळवळ पेटती ठेवली. १८४६-४७ या कालखंडात लोकांना वस्तुस्थिती समजावी म्हणून लेख, पुस्तके, पोस्टर्स, व्याख्याने या माध्यमाद्वारे गोऱ्यांचे काळे कारस्थान जनतेपुढे आणण्याचा त्याने अहर्निश प्रयत्न केला.
१८४५ साली ब्रिग्जने पार्लमेंटमध्ये जे भाषण केले त्यात तो म्हणतो, "मिस्टर रंगो बापूजी याचा नि माझा दाट परिचय झालेला आहे. गेली चोवीस वर्षे मी रंगोबाला ओळखत आहे. शिवाय तो गेली सात वर्षे आपल्या पदच्युत राजाच्या वाजवी हक्कासाठी झगडत या देशात वसती करून राहिलेला आहे. सत्ताधीश मालकाने सोपविलेली कामगिरी इतक्या प्रामाणिकपणे आणि नेकीने पार पाडणारा उमदा रंगो बापूजीशिवाय दुसरा माझ्या आढळात नाही, असे छातीठोक विधान करायला मला काहीही दिक्कत वाटत नाही" (ठाकरे पृ. २११-१२). केवढे प्रचंड प्रशस्तीपत्र रंगो बापूजीने मिळविले होते. १४ ऑक्टोबर १८४७ रोजी प्रतापसिंह परलोकवासी झाला. रंगो बापूजीला ही बातमी ४ डिसेंबरला कळली. `राजा मेला तरी न्याय मेला नाही` असा विचार करून, `अंगावरील वस्त्र नाहीसे होत तोवर मी येथे इन्साफाचा लढा देत राहणार` म्हणून या एकांड्या शिलेदाराने आपली जिद्द सोडली नाही.
इकडे बाळाजीपंत नातूने प्रतापसिंहाचा पिच्छा अद्याप सोडला नव्हता, सातारा राज्य खालसा झाले. प्रतापसिंहाच्या राणीने साताऱ्यास परत जाण्याची इच्छा व्यक्त केली. डलहौसी या लाट साहेबाने ती मंजूरही केली, पण तिची कार्यवाही करण्यास मुंबई सरकारने विलंब लावला. बाळाजीपंत नातू काशीस जाऊन राणीस भेटला आणि म्हणाला की तुम्ही रंगो बापूजीचा कैवार घेता म्हणून सरकारचा तुमच्यावर रोष आहे. तुम्ही त्याच्याशी आपला काही संबंध नाही असे लिहून दिले तर मी सरकारात रदबदली करेन. राणीसाहेबानी नाईलाजाने नातूचे म्हणणे मान्य केले आणि शरणागती पत्करली व रंगो बापूजीस परत बोलाविण्याचा खलिता लिहून दिला, आणि १४ डिसेंबर १८४७ रोजी कंपनीचा चेअरमन हॉबहाऊसने सातारा राज्य खालसा करण्याचा सल्ला डलहौसीला दिला.
राणीला तसा अधिकार नाही, राजाचे त्याला मृत्यूपूर्वी ९ दिवस आलेले गुप्त पत्र हेच त्याचे मृत्यूपत्र होय असा त्याने आग्रह धरला, `पण आम्ही तुला ओळखत नाही` हा एकच घोष कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चालू ठेवला. शेवटी `कायदेबाजीच्या अट्टाहासा` पुढे त्याचे आणि त्याच्या इंग्रज मित्रांचे सारे श्रम वाया गेले. प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, "रंगो बापूजी हा तर इंग्लंडातला पहिला हिंदी चळवळ्या म्हणून त्याचे नाव अजरामर राहील. हिंदी प्रश्नाबद्दल इंग्रजी जनतेपुढे जाहीर व्याख्याने देणारा हाच पहिला राजकारणी पुरुष" (पृ. २५३).
१८५३ च्या अखेरीस रंगो बापूजीला हताश होऊन परतावे लागले. यात त्याची चौदा वर्षे गेली. त्याच्या जिद्दीचे आणि त्याने सत्यासाठी उभ्या केलेल्या झगड्याचे महत्त्व ओळखून त्याच्या २२ इंग्रज मित्रांनी १८ पाकळ्यांचे एक चांदीचे तबक भेट म्हणून दिले. त्यावर जॉन ब्राईट, ब्रिग्ज, गॅटडफ, जोसेफ ह्यूम, जॉर्ज थॉमसन, रॉबर्टसन, कोगन इत्यादी अनेक मान्यवरांच्या सह्या आहेत, पण एलफिन्स्टनची नाही याचे नवल वाटते. एलफिन्स्टन आणि रंगो बापूजी या उभयतांची भेट कधी झाली असल्याचा उल्लेख कोठे आढळत नाहीत. जॉन ब्रिग्ज, ग्रँट डफ सारखे त्याचे विश्वासू सहकारी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या रंगो बापूजीच्या कार्यात सहभागी झाले होते, एलफिन्स्टन मात्र शेवटपर्यंत अलिप्तच राहिला.
१८५४ च्या फेब्रुवारीत रंगो बापूजी भारताच्या किनाऱ्यावर दाखल झाला, काशीला गेला, साताऱ्याला गेला आणि पुढे १८५७ च्या शिपायांच्या उठावात देखील सामील झाला. वेषांतर करून भारत यात्रा त्याने केली, आणि सर्व परिस्थितीची जाणीव करून घेतली. महाराष्ट्र सरकारच्या दफ्तरखान्यातील `पोलिफटल डायरीज` मधील संदर्भावरून त्याने सातारा, कोल्हापूराच्या परिसरांत उठावाची आखणी कशी केली होती याची कल्पना येते. आपला मुलगा सिताराम, मेव्हणा केशव निलकंठ चित्रे, गणेश सखाराम कारखानीस, सत्तू रामोशी, सखाराम दाजी काबाडे, नारायण पावसकर सोनार, शिवराम मोरेश्वर कुलकर्णी, दौलताहरी पवार, आप्पा फडणीस इत्यादी सहकाऱ्यांची संघटना बांधली, ठिकठिकाणी गुप्त केंद्रे सुरू केली, आणि गोऱ्या अधिकाऱ्यांची झोप उडविली. या उठावाचा शेवट अपेक्षेप्रमाणेच झाला. ५ जुलै १८५७ पासून रंगो बापूजी जो भूमीगत झाला तो कायमचा. त्याला पकडण्यासाठी ५००० रु. चे सरकारी इनाम जाहीर झाले होते, पण शेवटपर्यंत तो इंग्रजांच्या हाती कधीच सापडला नाही. ज्याचा जन्म कधी झाला आणि मृत्यू कधी झाला याची काहीच नोंद नसलेला हा भारताचा स्वातंत्र्य सैनिक अमर होऊन राहिला. (पाहा: खोबरेकर वि. गो. महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढे, पृ. ७८-८६)
प्रबोधनकार ठाकरे यांनी रंगो बापूजीच्या चरित्राची रचना विविध अंगानी केली आहे. इतिहास संशोधक, साहित्यिक आणि पत्रकार यांचा त्रिवेणी संगम प्रबोधनकारांच्या प्रस्तुत चरित्र ग्रंथात आढळून येतो. इतिहास संशोधकाचा साधनांसंबंधीचा चिकित्सक विचार, साहित्यिकाची ओघवती भाषा आणि साधने अपुरी पडतील तेथे कल्पनाशक्तीचा वापर करून इतिहासाचा सांधा जोडून घेण्याचे कौशल्य आणि पत्रकाराची आक्रमकता आणि ठोसपणा या त्रिगुणांचा ठायी ठायी प्रत्यय हा चरित्र ग्रंथ वाचत असताना येतो.
प्रबोधनकारांनी समकालीन इंग्रजी, मराठी साधनाचा चिकित्सकपणे अभ्यास केला होता हे विशेषतः पेशवे दप्तर, मराठी दप्तर रूमाल, प्रवास वर्णन, ऐतिहासिक कागदपत्रे यांचे जागोजागी जे उल्लेख केले आहेत त्यावरून स्पष्ट होते. एलफिन्स्टनच्या आणि एकूणच ब्रिटिशांच्या राजनीतीचा आणि त्यांनी विशेष अभ्यास केला होता याचीही कल्पना या ग्रंथाच्या वाचनावरून येते. एखाद्या विषयाचे महत्त्व चटकन लक्षात यावे म्हणून त्यांनी काही प्रकरणांना, आतील परिच्छेदांना जे मथळे दिले आहेत अथवा मधून मधून जे शब्दप्रयोग केले आहेत त्यावरून त्यांच्या रचना कौशल्याचा आणि पत्रकारितेचा प्रत्यय येतो. उदाहरणार्थ `सोनेरी पिंजऱ्यात सातारचा सिंह`, `भरी वर्चस्वाचा ज्वालामुखी भडकू लागला`, `ओता, ओता आणखी तेल ओता`, `राजा मेला तरी न्याय मेला नाही`, `ग्रंथ आटोपला तरी प्रवचन चालूच`, ही प्रकरणांची नावे अथवा, `डफळ्यांची जत तिची भलतीच गत`, `सचिवाचे भोर त्याला छत्रपतीचा घोर`, `नातूने आपले कावळे जमविले`, `शंकराचार्याचा दरोडेखोर दौरा` हे मथळे अथवा `चितपावनी आयागो` (बाळाजीपंत नातू), निराश प्रभू (रंगो बापूजी), `पोलिशी समजूत` (कबुली जबाबासाठी) हे शब्दप्रयोग, प्रबोधनकारांच्या शैलीचे निर्देशक आहेत.
इतिहासपर चरित्र लेखनात नेहमी वस्तुनिष्ठता असावी असे म्हटले जाते. परंतु हा सिद्धांत इतका काटेकोरपणे पाळला जात नाही किंवा तसे शक्य होत नाही असे अनेक इतिहासकारांचे मत आहे आणि अनुभवही आहेत. प्रबोधनकारांनी केलेल्या काही व्यक्तींच्या स्वभावचित्रणा- बाबतीत मतभेद होण्याची शक्यता आहे. पण आपले प्रतिपादन वाचकाच्या मनावर ठसावे म्हणून एखाद्या लेखकाने विशिष्ट तंत्राचा अवलंब केला असेल आणि वाचकांनी आपल्या विचारसरणीस तेवढाच भाग घेतला. तरी प्रतापसिंह महाराज, रंगो बापूजी आणि त्यांचा काळ या संबंधीची बरीच नवी माहिती वाचकांना या ग्रंथात मिळेल हे निर्विवाद आहे.
प्रबोधनकारांनी १९४७ साली हा ग्रंथ पूर्ण केला. त्यानंतरच्या काळात जी नवी अस्सल आणि दुय्यम प्रकारची साधने निर्माण झाली त्याच्या आधारे या ग्रंथास पुष्टीकारक अशा माहितीचा प्रपंच या प्रास्ताविकेत येथवर केला आहे. अर्थात या नवीन साधनामुळे या मूळ ग्रंथातील चरित्र कथनात काही बदल होतो असे नाही उलट, प्रबोधनकारांच्या प्रतिपाद्य विषयाला काही अशी पोषक ठरेल अशीच ही माहिती ठरणारी आहे.
या प्रास्ताविकेत काही अप्रकाशित साधनांचा वापर केला आहे. उदाहरणार्थ प्रतापसिंहाची मोडी लिपीत लिहिलेली एक अप्रकाशित कैफियत. ती अपूर्ण असून तिचा लेखक अज्ञात आहे. प्रतापसिंहाच्या बनारस येथील वास्तव्यात कर्नल ओव्हन्सने ही तयार करून घेतली असावी असे दिसते. या कैफियतेतील भाषेवरून ती प्रतापसिंहाने तोंडी सांगितली असावी आणि कोण्या लेखनिकाने ती उतरून घेतली असावी. दररोज रोजनिशी लिहिण्याची राजाला सवय जडली असल्याने हे अशक्य वाटत नाही. राजाला वाड्यातून काढून निंबळा छावणीत आणून ठेवले येथपर्यंतची हकीकत या कैफियतीच्या ४८ बंदांत आली आहे. ही संपूर्ण मिळाली असती तर राजाच्या काशी येथील वनवासावस्थेची माहिती आपल्याला कळली असती.
कंपनीच्या भारतातील आणि इंग्लंडमधील अधिकाऱ्यांच्या माहितीसाठी तयार केलेला हा कच्चा मसुदा असावा. ही कैफियत दोन दृष्टीने महत्त्वाची आहे. एक, तिसऱ्या इंग्रज मराठे युद्धाच्या प्रारंभीच्या काळात एलफिन्स्टन आणि प्रतापसिंहाचे सहकारी यांच्यात ज्या गुप्त बैठका झाल्या त्या ठिकाणाची नोंद आहे आणि दोन, प्रतापसिंहाविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांची तयारी कशी करण्यात आली याचा तपशील, विशेषतः या कटात सामील झालेल्या व्यक्तीचे नावे, आणि त्यांचे अंतस्थ हेतू याचीही नोंद येथे आढळते. पेशवे दफ्तरातील हस्तलिखित फेरिस्तांत (यादीत) रूमाल नं. ४ अशी याची नोंद आहे.
याखेरीज पेशवे दफ्तरातील प्रतापसिंहाच्या अप्रकाशित २६ रोजनिशी (यापैकी काही तुरळक नोंदी पेशवे दफ्तर खंड ४२ मध्ये आल्या आहेत) सातारा महाराजांचे दफ्तर, डेक्कन कॉलेजांतील मेणवली दफ्तर अथवा पारसनीस संग्रह, पुणे आणि मुंबई येथील पुराभिलेखागारातील अप्रकाशित इंग्रजी साधने, इंडिया ऑफीस लायब्ररी, लंडन येथील एलफिन्स्टन, ग्रँट डफ यांचा खाजगी पत्रव्यवहार इत्यादी साधनांचा अल्पसा उपयोग या प्रास्ताविकात केला आहे.
प्रबोधनकाराच्या या ग्रंथाचे पुनर्मुद्रण ५० वर्षांनी, आणि तेही भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात होत आहे हे फार औचित्यपूर्ण आहे. साताऱ्यासारख्या एका आकाराने छोट्या पण परंपरेने मोठ्या संस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी, स्वकीय आणि परकीय यांच्याशी, देशात आणि परदेशांत १८३९ पासून सतत लढा देणारा एक साधा माणूस, रंगो बापूजी किती महान कामगिरी करून जातो हा सारा इतिहास मोठा उद्बोधक आहे. एका छोट्या संस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारा रंगो बापूजी साऱ्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातदेखील कसा महत्त्वपूर्ण ठरतो, आणि इंग्रज हा केवळ संस्थानिकांचा नव्हे तर साऱ्या भारताचा एकमेव शत्रू आहे हे आपल्या कृतीने कसे पटवून देतो, आणि भारताच्या भावी स्वातंत्र्याच्या लढ्याची कशी पायाभरणी करतो हे वाचकांच्या मनावर ठसविण्याचा समर्थ प्रयोग प्रबोधनकारांनी या ग्रंथात केला आहे.
- अ. रा. कुळकर्णी
प्रस्तावनेसाठी वापरलेले संदर्भ ग्रंथ (१९४७ नंतरचे)
(अ) मराठी
कुलकर्णी अ. रा. - जेम्स कनिंगहॅम गँट डफ, पुणे, १९७०
खरे, ग. ह. (सं) - मराठ्यांचा इतिहास खंड ३, पुणे, १९८६
खोबरेकर वि. गो. - महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढे (१८१८-१८८४), मुंबई, १९९४
बेडेकर दि. के. (सं) - चार जुने मराठी अर्थशास्त्रीय ग्रंथ :
रामकृष्ण विश्वनाथ, पुणे १९६९.
हिंदुस्थानची प्राचीन व सांप्रतची स्थिती व पुढे काय त्याचा परिणाम होणार या विषयी विचार (प्रथम प्रकाशन १८४३) पृ. १-४२
नातू ग. वि. (सं) - नातू कुलवृत्तांत, पुणे १९६६
(ब) इंग्रजी
Ballhatchet K. A. - Social Policy & Social Change in Western India (1818-1830)
Choksey R. D. - Mountstuart Elphinstone. The Indian Years (1796-1827), Mumbai, 1971
Choksey R. D. - Raja Pratap Sinha of Satara (1818-1839), Pune, 1970
Choksey R. D. - Raja Shahaji of Satara (1839-1848), Pune, 1974
Kulkarni, Sumitra - The Satara Raj, Delhi, 1995
Varma, Sushama - Mountstuart Elphinstone in Maharashtra, Culcutta, 1991
आत्मनिवेदन
मऱ्हाठी शाळेत शिकत असताना मोडी वाचनाचा अभ्यास मला नियमाने करावा लागत असे. निरनिराळ्या तेढ्याबाक्या वळणांचे अनेक मोडी कागद परिक्षेत घडाघडा वाचावे लागत. त्यासाठी पनवेलच्या मामलतदार कचेरीतल्या जुन्या रिकार्डातल्या जाडजाड चोपड्या मुद्दाम शाळेत आणवून विद्यार्थ्यांकडून त्या वाचवून घेत. मोडी वाचनाच्या या अभ्यासासाठी माझ्या वडिलांनी एक दिवस (सन १८९६) मला एक छापील मोडी मजकुराचे पुस्तक आणून दिले. लंडन येथे शिळाछापावर छापलेले हेच ते रंगो बापूजीचे मोडी पुस्तक, त्या पुस्तकाचे नि रंगो बापूजीचे महत्व मला त्यावेळी ते काय वाटणार? रावसाहेब सीताराम विश्वनाथ पटवर्धनांच्या मोडी पुस्तकासारखेच, अभ्यासासाठी वडिलांनी डोक्यावर धोंड म्हणून ठेवलेले, आणखी हे पुस्तक! या पेक्षा त्या बालवयात विशेष ती काय कल्पना मला असणार? पुढे ते पुस्तक संग्रहातून नाहीसे झाले. आणि मलाहि त्याचे काही वाटले नाही. इतर अभ्यासाची पुस्तके नाहीशी होतात, त्यातलेच हे एक.
पण पुढे त्याच पुस्तकासाठी मुंबई, पुणे येथल्या बुकसेलरांच्या जुन्या ग्रंथांचे गळाठे उपसण्याचा प्रसंग येईल; कलकत्ता, लाहोर, दिल्ली, मद्रास, अलाहाबाद, येथल्या आणि लंडनांतल्याहि अनेक नामांकित बुकसेलराकडे पत्रावर पत्रे पाठविण्याची निकड लागणार, याची मला कल्पनाहि नव्हती. अखेर सन १९१९ साली "या दुर्मिळ पुस्तकाची एक प्रत कलकत्ता येथील कॅम्ब्रे आणि कंपनीच्या संग्रहाला आहे. त्याची किंमत ते ७५ रुपये मागतात. पाहिजे असल्यास व्हीपीने रवाना करण्याची व्यवस्था ठेवतो." अशी कै. बाळकृष्ण आत्माराम ऊर्फ रायबहादुर भाईसाहेब गुप्ते, कलकत्ता म्युझियमचे क्युरेटर, यांची मला अचानक तार आली. त्या वेळी दरमहा अवघे ४० रुपये कमावणारा मी तरुण धडपड्या संसारी!
संसाराच्या तोंड मिळवणीसाठी शिकवण्या करून आणखी जेमतेम ४०-५० कसेबसे हाती यायचे! पण माझ्या फाटक्या खिशाचा कसलाहि विचार न करता, मी उलट तार पाठविली कीं "ग्रंथ तात्काळ व्हीपीने पाठवून द्यावा." त्या वेळी पोष्टात वरचे वर सूचना देऊन एकेक महिनाभर व्हीपी थोपवून ठेवता येत असे. ग्रंथाची व्हीपी येताच मी पंधरा दिवसांची मुदत मागून घेतली नि रक्कम जमा करायच्या मागे लागलो. माझे मित्र माझ्यासारखेच फाटक्या खिशांचे! तरीहि कोणी ५, कोणी २ तर कोणी १० अशा देणग्या देऊन, रु. ७५-१२-० जमा होताच, ता. ७ एप्रिल १९१९ रोजी मी त्या अनमोल ग्रंथाचा ताबा घेतला.
ग्रंथ हातात येताच त्याचा अभ्यास सुरू झाला. एकहाती, एकटाकी, एवढा २५०-३०० पानांचा ग्रंथ मोडी लिपीत स्वताच्या हाताने लिहून लंडनला शिळाप्रेसवर छापवून घेणाऱ्या रंगो बापूजीच्या कौशल्याने नि कर्तबगारीने माझे डोळे दिपले. त्या पुरुषोत्तमाविषयी हृदयात आदराचा, आश्चर्याचा नि कौतुकाचा दर्या बेफाट उसळू लागला. सातारच्या अखेरच्या सत्वधीर प्रतापसिंह छत्रपतीच्या अस्सल मराठशाही मानीपणाचा नि सत्यासाठी सर्वस्वावर लाथ मारणाऱ्या त्याच्या पीळदार तडफेचा प्रत्यक्ष प्रत्यय पटल्यावर, मऱ्हाठी इतिहासातल्या या उपेक्षित भागाचे संपूर्ण संशोधन करण्याचा माझा निश्चय बळावला. मांजराच्या पिलकटाची मान मुरगाळून ते गुपचूप दूर झुगारून द्यावे, त्याची वार्ताहि पुढे कोणाला लागू नये. इतक्या कसाई करणीने आंग्रेजानी प्रतापसिंह छत्रपतीचे निर्दाळण केले होते.
रंगो बापूजीने जिवाचे रान करून, व्याख्याने लेख अर्जाअर्जी नि पार्लमेण्टातल्या मांडामांडीने तमाम इंग्लंडवर तुफानी चळवळीचा वणवा भडकावला नसता, तर प्रतापसिंहाच्या या दुर्दैवी कहाणीचे एक अक्षरहि शिलकी उरले नसते. पण पुढे १८५७ च्या बंडाळीनंतर अंग्रेजानी रंगो बापूजीच्या घराण्याची, त्याच्या नातलगांची आणि ठाणे, पुणे, कुलाबा नि सातारा जिल्ह्यातल्या कायस्थ प्रभु ज्ञातिबांधवांची जी रानटी ससेहोलपट केली. त्या धुमाळीत रंगो बापूजीविषयी कागदपत्रांचीहि भयंकर जाळपोळ नि वाताहात झाली. अशाहि दिव्यातून वाचलेल्या साहित्याचा उपयोग करून, हा इतिहास ठाकठीक लिहून मुद्रांकित केला नाही, तर ती मोठी नामुष्कीची गोष्ट होणार आहे, या विवंचनेने माझ्या काळजाला दंश केला.
या प्रकरणाचे मिळेल तेवढे साहित्य हस्तगत करण्याचा चौफेर तडाका चालू झाला. भराभर अनेक हितचिंतकांकडून जुनी पुस्तके, जुने अप्रसिद्ध कागदपत्र माझ्यांकडे येऊ लागले. जेथे मी जाई, तेथे रंगो बापूजीविषयी बैठी व्याख्याने मी देऊ लागलो. प्रतापसिंह छत्रपति नि रंगो बापूजी यांच्याविषयी सर्वसाधारण चरित्रेतिहासाची रूपरेषा सन १९२१ पर्यन्त तयार झाली. बारीकसारीक तपशिलांचा शोध हा ग्रंथ छापला जात असेतोंवर चाललेलाच होता. अस्पष्ट मुद्दे स्पष्ट होत गेले. माझे. स्वाध्यायशील जिवलग स्नेही कै. प्रो. गोविंदराव गोपाळ टिपणीस, महाडकर, यांची या साहित्यजुळणीच्या कामात कमाल मदत झाली. महाडहून ते दादरला आले का नेहमी काही ना काही नवीन पुरावे, नवीन कागदपत्र नि नवीन माहिती घेऊन यायचेच.
एक दिवस तर त्यानी रंगो बापूजीच्या अस्सल पत्रव्यवहाराचे एक जीर्ण चोपडे आणि यशवंतराव शिर्क्याची स्वदस्तुरची कै. प्रो. गोविंदराव गोपाळ टिपणीस हस्तलिखित रोजनिशी आणून दिली. रोजनिशी आणि पत्रव्यवहार यांचे महत्त्व काय सांगावे? ते दोन थोर पुरुष प्रत्यक्षच आम्हाला भेटून आपापल्या दैनंदिन हालचालीच्या कथा बारीकसारीक तपशिलानी स्वताच सांगू लागल्यावर, संशोधकाला आणखी ते काय हवे? `शिर्क्याची डायरी ज्याची त्याला परत केली पाहिजे, तेव्हा त्यातले तुम्हाला जे उतारे घ्यायचे असतील ते घेऊन पुढच्या खेपेला ती मला परत द्या`, असे टिपणिसानी सांगितल्यावरून, मी त्यातले अनेक महत्वाचे उतारे नकल केले नि डायरी परत केली. त्या वेळी माझे प्रबोधन पाक्षिक चालू असल्यामुळे, यशवंतराव शिर्क्याचा सन १८३९ सालचा विलायतचा प्रवास हा मजकूर ता. १६ जुलै १९२२ च्या अंकात प्रसिद्ध केला. प्रतापसिंहाचे एक महत्वाचे पत्र ता. १६-४-१९२३ च्या अंकात आणि रंगो बापूजीची २ महत्वाची पत्रे ता. १ ऑगष्ट १९२३ च्या अंकात प्रसिद्ध केली.
(तें विलायत-प्रवास वर्णन आणि तीं ३ पत्रे सन १९४० सालीं प्राध्यापक कृ. पां. कुळकर्णी आणि श्री. श्रीपाद रामचंद्र टिकेकर यांनी संपादन केलेल्या `मराठी गद्यविलास मध्यम श्रेणी` पुस्तकात मार्मिक प्रस्तावासह समाविष्ट केलेली आहेत.)
रंगो बापूजीच्या मोडी पत्रांचे नकलकाम मात्र मोठे कठीण नि किचकट होते. लंडनचा सर्व पत्रव्यवहार रंगो बापूजी कॉपिंग शाईने मोडी लिपीत करून ती पत्रे क्रमवार एका पातळ टिशू कागदांच्या बांधीव पुस्तकात ओल्या ब्लॉटिंग कागदाच्या सहायाने दाबून काढीत असे. अशी ही अंदाजे ४०० वर पत्रे आधी हातात धरताच येत ना. वाचायच्या बाजूला मजकूर फिकट पडलेला. मागल्या बाजूला शाईचा प्रत्यक्षच संस्कार झालेला. तेव्हा तेवढी बाजू मात्र बरीच स्पष्ट. आरशाच्या काचेवर पत्राचा पाठमोरा भाग प्रतिबिंबीत करून वाचन करायचे आणि ते अस्सलबरहुकूम नकलायचे अतिशय त्रासाचे नि डोळेफोडीचे काम पुण्याचे सुप्रसिद्ध इतिहाससंशोधक, हिंदवी इतिहासाचे साहित्य-शोधन करण्यासाठी मुंबई सरकारने मुद्दाम लंडनला पाठविलेले स्कॉलर चि. वासुदेव सीताराम ऊर्फ बाप्पा बेन्द्रे यानी वा. सी. बेन्द्रे, पुणे. आंगावर घेऊन, फार मेहनतीने नि कुशलतेने सन १९२३ अखेर पुरे केले. म्हणूनच हा ग्रंथ लिहिताना त्या पत्रव्यवहाराचा अभ्यास मला बिनवासाचा झाला.
बहुजन समाजवादी चळवळ आणि शाहू महाराज
एकदा (सन १९२०) नेहमीप्रमाणे मी कै. शाहू महाराज छत्रपति करवीरकर यांच्या भेटीला खेतवाडीतल्या त्यांच्या पन्हाळा लॉज निवासस्थानी गेलो. त्या वेळी बामणेंतर बहुजन समाजाची आत्मोद्धाराची चळवळ सोसाट्याने चालू होती. शाहू महाराज तिचा कमाल अट्टहासाने पुरस्कार करीत होते आणि पुणे साताऱ्याच्या बामणी वृत्तपत्रांतून नि बामणांच्या सदाशिवपेठी जाहीर सभांतून महाराजांची निंदा नि उपहास बेफाम अखंड चालू होता. "महाराजानी, फार झाले तर, आपल्या कोल्हापूर संस्थानाच्या हद्दीत काय धिंगाणा घालायचा असेल तो खुशाल घालावा. पण बाहेरच्या महाराष्ट्रातल्या बामणेतर बहुजन समाजाना चिथाऊन, शहाण्यासुरत्या नि सार्वजनीक हरएक कर्माचे बुद्धिसिद्ध कंत्राट चालविणाऱ्या बामण समाजाविरूद्ध बामणेतरांची फळी उभारण्याचे काम करू नये." अशा मतलबाची गुप्त राजकारणे सातारा, पुणे, धुळे येथली चळवळी बामण मंडळी मुंबई दिल्लीच्या आंग्रेजी दरबारात अट्टाहासाने लढवीत होती. जवळजवळ प्रतापसिंहकालीन नातूप्रासादीक भटांच्या कारवायांच्या इतिहासाची तंतोतंत पुनरावृत्तीच म्हणा ना ती! सातारा जिल्ह्यात बामणेतर सत्यशोधकानी बामणांवर सगळीकडे भयंकर अत्याचार चालवल्याची हाकाटी पुण्याची बामणी पत्रे एकसारखी करीत होती.
महात्मा ज्योतीराव फुल्यांच्या सत्यशोधकी पद्धतीप्रमाणे मराठे वगैरे मागासलेल्या समाजांत भिक्षुकांच्या मध्यस्थीशिवाय विवाह साजरे होऊ लागल्यामुळे, गावोगावच्या पंचांग्या भटाभिक्षुकांची साहजीकच कर्कश कावकाव चाललेली होती आणि वऱ्हाडात तर जोशी हक्काच्या सबबीवर अनेक असल्या बामणेतरांवर फिर्यादी ठोकण्यात येऊन, अनेक नामांकित भट वकील ते खटले लढविण्यात विनावेतन सरसावले होते. लोक जागृतीचे साधन म्हणून शाहू महाराजाच्या प्ररेणेने तयार झालेल्या सत्यशोधक जलसेवाल्यांवर गावोगाव धोंडेमार करण्यासाठी बामण तरुणांच्या सेना, आजकालच्या हिंदुत्वनिष्ठांप्रमाणे किंवा राष्ट्रीय स्वयंसेवकांप्रमाणे, सर्वत्र संचार करीत होत्या.
कसला तरी मनस्तापाचा प्रश्न होता. नेहमीप्रमाणे महाराज, दिवाणसाहेब सर सबनीस आणि मी अशी फक्त तिघांचीच बैठक जमल्यावर, त्या प्रश्नावर आमची चर्चा चालू झाली. महाराजानी आपल्या संस्थानाबाहेरच्या हद्दीत कसलीहि चळवळ करू नये, अशा दमघाटीच्या शिफारशीचा खलिता मुंबई सरकारातून आलेला होता नि आदल्याच दिवशी महाराजानी त्याला खणखणीत जबाबहि दिलेला होता. "महाराष्ट्रातील अस्पृश्यांसकट तमाम मागासलेल्या बहुजन समाजांचा उद्धार, हे माझे पवित्र जीवनकार्य आहे. या लक्षावधि शेतकरी कामकरी नि मजूर बांधवाची सामाजिक, धार्मिक नि आर्थिक सुधारणा झाल्याशिवाय, सरकारने राजकारणी हक्कांची भाषा बोलावी तरी कशाला? हक्क देणार कोणाला? घेणारे कोण? आणि त्यांचा अडाणी बामणेतराना अर्थ तो काय कळणार नि फायदा तरी काय होणार? सरकार मला पदच्युतीच्या बुरखेबाज धमक्या देत आहे. त्या मागे कोणाच्या चिथावण्या नि कारवाया आहेत. ते मला माहीत आहे. तुम्ही पदच्युत करण्यापूर्वी, मीच आत्मसंतोषाने गादीचा राजीनामा देईन. वयात आलेला माझा युवराज तात्काळ बसेल गादीवर. पण एकदा हातात घेतलेली बामणेतर बहुजन समाजांच्या उद्धाराची चळवळ प्राण जाई तोंवर हा शाहू सोडणार नाही." अशा अर्थाचा तो जबाब होता.
"क्षत्रियाला अनुचित कर्म मी करणार नाही."
सरकार दरबारी खलित्याच्या जोडीनेच, काही निवडक इंग्रज मित्रांकडून, चळवळ सोडण्याविषयी महाराजांवर वजन खर्च करण्याची खटपट चालू होती. अशा एका इंग्रेज मुत्सद्याच्या पत्राला महाराजानी जबाब दिला - "मी ब्राम्हणांच्या विरुद्ध भाषणे केलेली नाहीत, अगर दुसरे काहीहि केलेले नाही. पण आपल्या स्वभावाला अनुसरून ते माझ्यावर सूड उगवीत आहेत. त्यांच्या पेशवाई बरवेशाही किंवा परशुरामशाही कारस्थानाना परमेश्वर यश देवो. मी तुमचा उपदेश ऐकेन, पण क्षत्रियाला अनुचित रीतीने मला वागता येणार नाही. मला कैद केले तरी माझा देह कोणत्या तरी सत्कारणी खर्चण्याचा मी प्रयत्न करीन. ज्या रणभूमीवर भी उभा राहिलो आहे, तेथून पाय मागे घेणे माझ्या शीलास डाग लावण्यासारखे आहे.
मी तुमचा उपदेश स्वीकारीन, पण त्याप्रमाणे वागणे मला अशक्य आहे. लॉर्ड यानीच काय, पण खुद्द ब्रह्मदेवाने अथवा यमाने मला धमकी घातली आणि मी भ्यालो, तर माझे पूर्वज आणि स्वर्गातील देव माझ्याकडे पाहून हसतील नि रडतील. जयापजयाची मला पर्वा नाही. माझा स्वभाव तुम्हाला बदलता येणार नाही. भित्र्या भागूबाईप्रमाणे ती माझी मते सोडणार नाही, किंवा जीव बचावण्यासाठी देखील कोणाला शरण जाणार नाही. मी तुटेन पण वाकणार नाही. जपमाळ ओढीत बसणाऱ्या भटजीप्रमाणे मी कालक्षेप करणार नाही. तुम्ही म्हणता, सरकार रागावेल. रागावो बिचारे. मला त्रास होईल यात शंका नाही. परंतु गरजवंताना मदत केल्याबद्दल, अस्पृश्याना हात दिल्याबद्दल आणि मराठ्यादि मागासलेल्या समाजांचा उद्धार करण्याकरिता माझी शक्ति खर्च केल्याबद्दल, परमेश्वराकडून मला खचित न्याय मिळेल. माझ्या पूर्वजांचे स्मरण करून मी तुम्हाला सांगतो कीं, क्षत्रियाला अयोग्य असे काहीहि मी करणार नाही. माझ्या आईच्या नावाला मी काळिमा लावणार नाही. मला तुमचे धोरण मुळीच मान्य नाही."
छत्रपतीपुढे छत्रपतीची कहाणी
महाराजांच्या सूचनेवरून दिवाणसाहेबानी त्या पत्राची नक्कल मला वाचायला दिली. वाचून झाल्यावर, "यात नवीन काय आहे? ही तर इतिहासाची पुनरावृत्ति आहे! या पत्रात मला तर छत्रपति प्रतापसिंहच बोलतो आहेसा दिसतो." असे उद्गार सहज माझ्या तोंडातून बाहेर पडले. महाराज एकदम चमकले नि मला म्हणाले- "प्रतापसिंह छत्रपति? म्हंजे आमचे बुवासाहेब महाराज कीं काय? त्यांची भाषा या पत्रात? ही काय भानगड?" साक्षात् छत्रपतीपुढे एका दिवंगत छत्रपतीची कहाणी सांगण्याचा असा अवचित योग आल्यामुळे, मीहि मोठया अवसानात येऊन, सत्वधीर प्रतापसिंह आणि स्वराज्यनिष्ठ रंगो बापूजी यांचा इतिहास, दीड दोन तासांच्या अस्खलित प्रवचनाने महाराजाना ऐकवला. त्यांच्या डोळ्यांतून सारखा अश्रूप्रवाह वहात होता. माझे पुराण संपल्यावर महाराज म्हणाले- वाहवा! आज मला मोठा धीर आला.- "कारस्थानी बामणांच्या चिथावणीने आंग्रेज बहादुरांच्या डोळ्यांत सलणारा मीच एकटा छत्रपति नव्हे तर! मोठे भयंकरच राजकारण होते ते म्हणायचे! पण हा सारा इतिहास कोठेच छापलेला दिसत नाही. मी तर तो आजच ऐकला. आमची आपली समजूत की बुवासाहेब महाराजानी खरोखरच काही बंड केले नि आंग्रेजानी त्याना गादीवरून काढून हद्दपार केले. अस्सा इतिहास आहे का हा? हे बघ कोदण्ड, तुझी इतर लिहिण्याची कामे ठेव आता बाजूला नि पहिल्या प्रथम हा इतिहास मुद्यापुराव्यांनिशी तपशीलवार लिहून काढ. वाटेल तर दे नोकरीचा राजीनामा. मी सांभाळतो तुझा सारा प्रपंच. छापण्याबिपण्याची जबाबदारी सारी माझ्यावर. मात्र, झटपट झाले पाहिजे हे काम."
"साताऱ्यात प्रतापसिंहाची कहाणी सांग"
शाहू महाराजांचे उत्तेजन मिळाल्यामुळे, या इतिहासाचे मिळेल तितके साहित्य गोळा करण्याच्या उद्योगाला मी लागलो. काम चालू आहे अशा सबबीवर दीड दोन वर्षे सहज निघून गेली. सन १९२२ एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात शिवजयंतिनिमित्त जाहीर व्याख्यानासाठी मी साताऱ्याला जात असताना, पुणे स्टेशनवर शाहू महाराजांची अचानक गाठ पडली. कोठे जातो, कशाला जातो, वगैरे चौकशी करून महाराज म्हणाले "अरे आता शिवाजीचा इतिहास सगळ्याना माहीत आहे. त्यात नवीन आणखी काय सांगणार? साताऱ्यालाच जातो आहेस तर प्रतापसिंह छत्रपतीची कहाणी, मला सांगीतलीस तशीच, सांग सगळ्या मावळ्याना नि घाल त्यांच्या डोक्यांत नव्या विचारांचे वारे. मी जातोय बडोद्याला लग्नासाठी. परतल्यावर मला मुंबईला भेट. हा इतिहास छापण्याची आता लगबग केली पाहिजे.”
सातारच्या व्याख्यानांचा परिणाम
प्रतापसिंह नि रंगो बापूजी यांच्या संमिश्र चरित्रांचे ३ हप्त्यांचे नि ३ दिवसांचे माझे व्याख्यान साताऱ्याला चांगलेच दणाणले. ज्या राजवाड्यात तो चित्तप्रक्षोभक मुकाबला घडला, त्या वाड्याच्या पायऱ्यांवरच उभे राहून, ती कथा सांगण्यात आल्यामुळे, व्याख्यानाला भलताच रंग चढला. कित्येक महिने सबंध सातारा जिल्हा प्रतापसिंह आणि रंगो बापूजी यांच्या कहाणीच्या तपशिलानी घोंगावत होता. ज्याच्या त्याच्या तोंडी एकच विषय. तेथल्या दोघा शाहिरानी दोन दांगडी पोवाडे तात्काळ रचून, त्यांचे जलसे जिल्हाभर गाजवले. [परिशिष्टात हे पोवाडे छापले आहेत]. कै. श्रीपतराव शिंद्यांच्या `विजयी मराठा` पत्राच्या खास बातमीदाराने त्या व्याख्यानांचा रिपोर्ट पाठोपाठ तीन अंकात छापल्यामुळे, हा इतिहास तमाम महाराष्ट्रात सर्वश्रुत झाला. माझे दिवंगत स्नेही अच्युतराव कोल्हटकर यांच्या जिवाग्री हा विषय इतका झोंबला की त्यानी त्यावेळी त्यांच्या हातात असलेल्या टिळक साप्ताहिकाच्या ता. १७ नि २५ जून १९२२ च्या अंकांत ते सर्व व्याख्यान छापून त्यावर एक संपादकीय स्फुटहि लिहिले. ते असे-
"प्रतापसिंह महाराजाना पाजी बाळाजीपंत नातू आणि विश्वासघातकी आप्पासाहेब भोसले यानी गादीवरून कसे काढले. या हकिकतीचा पूर्वभाग आम्ही गेल्या अंकात दिलेला आहे. हा वाचून ज्यांना संताप येणार नाही, जो रागाने खवळून जाणार नाही. ज्याचे डोळे क्रोधाने लाल होणार नाहीत, असा मनुष्य अस्तित्वात असणे अशक्य आहे. रा. रा. ठाकरे यानी सांगितल्याप्रमाणे जर सातारचे इंग्रज रेसिडेंट यानी महाराजाना ऐन रात्री पलंगावरून खेचले असेल, जर महाराजाना नुसत्या चोळण्यानिशी पालखीत बसावे लागले असेल, जर त्याना लिंबास जनावरांच्या मुतारीच्या घाणीत उतरावे लागले असेल, जर राजकन्या गोजराबाई हिची तेथे अकाली प्रसूति झाली असेल आणि जर मेण्यातल्या मेण्यात बाळासाहेब सेनापतीचा मुडदा पडला असेल, तर आम्ही म्हणतो कीं असल्या मांगहृदयी कृत्यांस इतिहासात जोड सांपडणेच कठीण आहे.
प्रतापसिंह महाराजांचे अखेरपर्यन्त असे म्हणणे होते कीं `मी निर्दोष आहे` आणि हा आपला निर्दोषपणा स्थापन करण्याकरिता त्यानी रंगो बापूजी गुप्ते या आपल्या विश्वासू अधिकाऱ्याला विलायतेस पाठविले होते. परंतु प्रतापसिंह महाराजांची उघड चौकशी कधीहि झाली नाही आणि `मी निर्दोष आहे, मी निर्दोष आहे`, असे छातीठोकपणाने अखेर पर्यंत म्हणणारा हा सत्याग्रही राजा अखेर कुजून कुजून प्रतिबंधात मरण पावला. प्रतापसिंह राजा, तुझे राज्य परत देणे हे आमच्या हाती नाही व तुला परत सजीव करणे हेहि आम्हास शक्य नाही. परंतु अजूनहि तूं आम्हास प्रिय, वंद्य व संस्मरणीय आहेस. व पाजी बाळाजीपंताने व विश्वासघातकी आप्पासाहेबाने पीडलेल्या तुझ्या आत्म्याबद्दल रोज क्रोधाचा तीव्र श्वास सोडल्याखेरीज एकहि महाराष्ट्रीय रहाणार नाही."
यानंतर अच्युतराव जेव्हा जेव्हा मला भेटायचे तेव्हा तेव्हा "काय बाबा, आमच्या रंगो बापूजीचे काय केले?" हा प्रश्न बिनचूक ठरलेला. त्यांच्या अकाली मृत्यूपर्यंत हे दुमणे सारखे चालू असे.
छत्रपतीच्या हातावर शपथेचा हात
सातारचे व्याख्यान देऊन मी परत मुंबईला आलो. २-३ दिवसानी शाहू महाराज बडोद्याहून पन्हाळा लॉजमध्ये आल्याचे समजले. पण ते हृदयाच्या विकाराने अत्यवस्थ असल्याचे कळले. ४ नि ५ मे १९२२ अशा दोन दिवशी सकाळी मी त्यांच्या भेटीसाठी लॉजवर गेलो. तेथे सारे बडोदेवालेच दिसले. कोल्हापूरचा एकहि इसम दिसे ना. महाराजाना कोणी भेटायचे नाही, असा डॉक्टरांचा हुकूम आहे. असे सांगून त्यानी मला हुसकाऊन दिले. ५ तारखेला संध्याकाळी दिवे लागल्यानंतर एक मोटारगाडी दादरच्या लेडी जमशेटजीरोडवर चौकशी करीत फिरत होती. "येथे कोदण्ड कोण रहातात?" एवढेच विचारीत ते लोक फिरत होते.
अशाने त्या बडोदेवाले नवख्याना माझा काय पत्ता लागणार? इतक्यात त्यावेळी कीर्तिकर चाळीत रहाणारे माझे मित्र श्री. भास्कर हरि ठाकूर त्याना भेटले. आम्ही कोल्हापूरच्या महाराजांकडून आलो आहो, असे सांगताच, ठाकूर यानी `कोदण्ड` शब्दाचा अर्थ बरोबर बसवला नि त्याना `ठाकरे, मिरांडाची चाळ` असा पत्ता देऊन बिनचूक माझ्याकडे पाठविले. दादरला शाहू महाराजाचा संबंधी फक्त ठाकरे, हे सहळ्यांना माहीत होते. पण शाहू महाराज मला `कोदण्ड` नावाने हाक मारीत. हे कोणालाच माहीत नव्हते.
शाहू महाराजानी आत्ताच्या आत्ता बोलावले आहे, असा निरोप सांगताच मी तसाच त्या गाडीतून मुंबईला गेलो. तेथेहि १० वाजेपर्यंत डॉक्टराची परवानगी मिळेतोंवर खाली स्वस्थ बसलो. रात्री १० वाजता एका हुजऱ्याने मला पहिल्या मजल्यावर नेले. महाराजांची छावणी असताना जो पन्हाळा लॉज गडबडीने गजबजलेला असायचा, तोच आता मला निहूप शांत पाहून चमत्कारिक वाटले. वर गेलो. एका दिवाणखान्यात महाराजांचा तो धिप्पाड देह पलंगावर उताणा पडलेला होता. निळ्या दिव्याचा मंद प्रकाश मनाला उदासीन करीत होता. एक हुजऱ्या महाराजांची छाती शेकत होता. जवळ डॉक्टर उभे होते.
महाराजांच्या उजव्या हाताच्या बाजूला मी गेलो, दोन हात जोडून नमस्कार केला नि त्यानी पुढे केलेल्या हाताच्या पंजावर मी मस्तक टेकले. "काय केलेस साताऱ्याला जाऊन?" एवढेच शब्द महाराजांच्या तोंडून पडतांच एकदम डॉक्टर म्हणाले `हं महाराज, बिलकूल बोलायचे नाही.` "छे छे, प्रश्न विचारला" महाराज हसत म्हणाले, "आता सारे हाच बोलणार आणि मी फक्त ऐकणार." मी सारी हकीकत सांगितली. अंदाजे पाच मिनिटे तरी मी बोलत होतो. `छान` महाराज म्हणाले. "या विषयाला तोंड फुटले. ठीक झाले. मी उद्या कोल्हापूरला जातोय. तू चल माझ्याबरोबर, म्हणजे पुढचे बातबेत ठरवू, सध्या मला रजा नाही. मी मागाहून येईन." असे मी सांगताच, महाराज म्हणाले- "थापबाजी नाही ना करणार? तू वांड आहेस. ग्रंथ लिहून देईन अशी शपथ कर."
"सत्वधीर छत्रपति प्रतापसिंह आणि रंगो बापूजी
हा ग्रंथ लिहून मी पुरा करीन, अशी शपथ घेतो"
असे बोलून महाराजानी पुढे केलेल्या त्यांच्या उजव्या हातावर मी शपथेचा हात ठेवला. पुन्हा नमस्कार करून मी परतलो. साडे अकरा वाजता दादरला येऊन, जेवण वाचन करून झोपलो. सकाळी ७ च्या सुमाराला सौभाग्यवतीने जागे करून घाबरत सांगितले- "उठा उठा, रस्त्यावर लोक जमले आहेत नि शाहू महाराज वारले असे बोलताहेत." बाहेर येऊन मी चौकशी केली. बातमी खरी ठरली. मस्तक सुन्न झाले. खलास मामला! कोल्हापूरचा संबंध कायमचा तुटला. मागासलेल्या बहुजनसमाजाचा वाली गेला. त्यांच्या आत्मोद्धाराच्या प्रचण्ड धडपडीवरील सर्चलाईट विझला!
शाहू महाराजांच्या आकस्मिक मृत्यूच्या धक्क्याने या इतिहासाचा विषयच मागे पडल्यासारखा झाला. तथापि ठिकठिकाणच्या इतिहासप्रेमी प्रबोधन-भक्तांची आतुरता मात्र मला स्वस्थ बसू देई ना. बडोद्याचे माझे स्नेही राजरत्न प्रो. माणिकराव यानी रंगो बापूजीच्या मोडी पुस्तकाचे बालबोधीकरण केलेले चोपडे पाठवून दिले. आता तरी हा इतिहास लिहून पुरा करा, हा त्यांचा आग्रहाचा हेतु, बोरगांव (सातारा जिल्हा) येथले चिटणीस-वंशज श्री. भगवंत बळवंत चिटणीस यानी रंगो बापूजी नि प्रतापसिंह यांच्या हातचे नि वेळचे काही दस्तऐवज नि पत्रे पाठवून दिली. त्यात कटबाजांच्या जबान्या, प्रतापसिंहाची ८ पत्रे आणि पार्लमेण्टाला पाठविलेले अर्ज, हे दस्तऐवज थेट लंडनची हवा खाऊन आलेले असल्यामुळे, त्यांचे महत्त्व जाणून परिशिष्टांत त्यांची मी बरदास्त ठेवली आहे.
पार्लमेण्टाला पाठविलेले अर्ज फार प्रेक्षणीय होते. मोहोरेदार जाड घोटीव जुन्नरी कागदाना अभ्रकाच्या भुकटीने घासून चमकदार बनविलेले. दोनी बाजूनी सुंदर बॉर्डरीचे नक्षीकाम केलेले आणि मधोमध घोसदार वळणदार मोडी मजकूर काळ्या कुळकुळीत शाईने लिहिलेला. या सर्व कागपत्रांचे माझ्या स्वाध्यायाश्रमात पंधरा दिवसांचे एक जाहीर प्रदर्शन मी भरविले होते. (सन १९२२). सातारा रोडला प्रबोधनची छावणी गेल्यावर तेथे हे सर्व कागद खास पुरवणीने छापून प्रकाशात आले.
मेजर बी. डी. बसूंची दादरला भेट
या सुमाराला माझे कलकत्त्याचे पत्रपंडित स्नेही बाबू रामानंद चतर्जी यांची ओळखचिठ्ठी घेऊन मेजर बी. डी. बसू. आय. एम. एस. (अलाहाबाद) हे अवचित दादर स्वाध्यायाश्रमात मला भेटायला आले. त्यांच्या `स्टोरी ऑफ सातारा` या इंग्रेजी ग्रंथासाठी ते महाराष्ट्रात साहित्य जमा करीत होते. "मिळेल ते मऱ्हाठी साहित्य प्रथम दादरच्या ठाकऱ्यांकडून मुद्दाम तपासून घ्या." अशा सूचनेने बाबू रामानंदजीनी मेजर बसूंची माझ्याकडे पाठवणी केलेली होती. तीन दिवस नि रात्र आम्ही दोघानी हस्तगत साहित्याची चिकित्सा केली. माझ्या संग्रहीच्या महाठी साहित्याची काही भाषांतरे त्याना दिली. बोरगावचे अस्सल साहित्य त्यानी पाहिले.
या वेळी त्यांचा ग्रंथ कलकत्त्याला बहुतेक छापून झाला होता. फक्त परिशिष्टे राहिली होती. मिळालेले मऱ्हाठी साहित्य इंग्रेजीत संपूर्ण भाषांतर होणार कधि नि त्यांचा माझ्या ग्रंथात पुरस्कार होणार कसा, असा मेजर बसूच्यापुढे पेच पडला. अखेर, "इंग्लीश भाषा जाणणारांसाठी मी आपली इंग्लीश स्टोरी आधी बाहेर काढतो. मागाहून तुम्ही या मोडी मऱ्हाठी साहित्यावर आधारलेला तुमचा मऱ्हाठी इतिहास बाहेर काढा. म्हणजे दोनहि ग्रंथांचा एकमेकाना पुरस्कार होईल. शिवाय, प्रतापसिंह नि रंगो बापूजी या थोर पुरुषोत्तमाना दोन प्रांतातल्या दोन भिन्नमाषी लेखकानी आदराचे प्रणाम केल्यासारखेहि होईल." अशी तडजोड बसूनी काढली नि ते परत गेले. बसूंचा ग्रंथ अखेर बाहेर पडला आणि त्याने आंग्लभाषाभिज्ञ रसिकाना प्रतापसिंहाच्या आत्मयज्ञाने आणि रंगो बापूजीच्या अष्टपैलू मुत्सदगिरीने चकित केले.
आंग्लाळलेल्या देशी पंडिताना आणि गोऱ्या नोकरशाहीला मात्र या ग्रंथाच्या बाँबस्फोटाने चांगलेच दणके दिले. ता. ६ मार्च सन १९२३ च्या केसरीत नरसोपंत केळकरानी स्वता मेजर बसूंच्या स्टोरीचे केलेले परिक्षण त्यांच्या शतपैलू विद्वत्तेला साजणारे असल्यामुळे, मुद्दाम परिशिष्टात दिलेले आहे. नरसोपंताच्या चिरंजीवाने अर्धवट अकलेच्या भांडवलावर रंगो बापूजीला देशद्रोही ठरविला असला, तरी त्या पुरुषोत्तमाविषयी आपल्या बापाचा काय अभिप्राय होता, एवढे तरी आता या शहाण्याला दिसून येईल.
मेजर बसूनी आपल्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत शेवटी लिहिले आहे की "माझा हा ग्रंथ हिंदुस्थानातल्या इंग्लीश भाषा जाणणारासाठी लिहिलेला असला तरी या ग्रंथाएवढाच एक मोठा मऱ्हाठी इतिहास मुंबईचे ख्यातनाम पत्रपंडित श्रीयुत केशव सीताराम ठाकरे लिहून लवकरच बाहेर काढणार आहेत.” `लवकरच` म्हटले तरी सन १९४७ साल खतम झाले!
पुण्याला प्रबोधनची छावणी पडल्यावर या विषयाला थोडा जोर लागला. श्री. बाप्पा बेन्द्रे आणि श्री. गोपीनाथराव बाळकृष्ण पोतनवीस, उरवडेकर, यांच्या अखंड आग्रहाने, रंगो बापूजीचे व्याख्यान आणि एक संक्षिप्त चरित्र प्रबोधनात छापले गेले. सन १९२६ साली छापखाना नि माझी वृत्तपत्रे या एकांड्या शिलेदारी व्यवसायात माझ्या आजारामुळे मी हापटी खाल्ली, तेथपासून तो सन १९४६ च्या सपटंबरापर्यन्त या इतिहासाच्या बाबतीत, तो मला मेला नि मी त्याला मेलो, अशी अवस्था होती.
तुका म्हणे नाही चालत तांतडी, प्राप्तकाळ घडी आल्याविना. या महिन्यात एके दिवशी माझी मलाच शरम वाटू लागली. शाहू महाराजाना दिलेल्या शपथेच्या आठवणीने माझे मन मला खाऊ लागले. सन १९३५ च्या आजारातून मी वांचलो, तो काय नुसता जगण्यासाठी? ठेवली हातातली सारी कामे बाजूला काढली संदर्भाची सारी पुस्तके टेबलावर आणि दोन प्रकरणे लिहून झाल्याशिवाय अन्नाला स्पर्श करायचा नाही, अशा निश्चयाने बसलो ठाण मांडून कामाला. रोज १० तास अखंड काम झाल्याशिवाय जेवायचेच नाही, अशा निर्धाराने प्रकरणांमागे प्रकरणे रंगत गेली. या निर्धाराला माझे स्नेही श्री. काशीनाथ महादेव ताम्हनकर बी.ए. (माजी संपादक, दैनिक नवशक्ति, मुंबई) यांचे उत्तेजन सारखे माझ्या मागे होते.
मी हा इतिहास लिहिण्यास घेतल्याचे वृत्त सर्व वर्तमान पत्रांत त्यानी जाहीर केले. श्री. श्रीपादराव रामचंद्र टिकेकर, मुंबई रॉयल एशियाटिक सोसायटीचे लायब्रेरियन, यानी तर मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओवरून सन १९४७ ल्या एका शनिवारच्या नमोवाणीच्या परिसरात या कार्यक्रमात. यशवंतराव शिर्के यांचा १८३९ सालचा विलायत प्रवास आणि रंगो बापूजीची कामगिरी यावर लिहिलेले एक चित्ताकर्षक प्रहसन ध्वनिक्षेपित करविले. मुंबईच्या आकाशवाणीने या इतिहासाची कहाणी सर्वश्रुत करताच, महाराष्ट्रात सर्वत्र मोठे कुतुहल निर्माण झाले नि तशी ठिकठिकाणची पत्रे सारखी येऊ लागली. उत्तेजनाचा असा नेट सारखा चालू झाल्यामुळेच, माझ्या हातून हे कार्य पुरे झाले. त्यातच पुन्हा बेळगांवच्या सौ. वैद्यालंकृति रंगुबाईसाहेब जाधव यानी `लेखनाला उत्तेजन` म्हणून, माझे मित्र इतिहास भास्कर पां. गो. रानडे यांचे हस्ते मला रोख १०० रुपयांची देणगी पाठवून दिली.
सातारचे पेन्शनर मामलेदार रावबहादुर एस. के. दुधुस्कर यानीहि बरेच नवनवे साहित्य नकलून पाठवून दिले. श्री. शांताराम रघुनाथ पोतनवीस यांनी वेळोवेळीं लिहिला मजकूर वाचून, उपयुक्त सूचना केल्या आणि पोतनवीस दप्तरातले महत्त्वाचे कागद पुरविले. काशीच्या एका चित्रकाराने काढलेली प्रतापसिंह आणि यशवंत मल्हार चिटणीसाची रंगीत तसबीर, गेली शंभर वर्षे पोतनविसांच्या देव्हाऱ्यात अखंड पूजली जात असते. ती या ग्रंथात छापण्यासाठीं त्यानी दिली. त्याना अनेक धन्यवाद.
ग्रंथ लिहून झाला तरी तो वाचकांच्या हातात ठेवण्याचे काम प्रकाशकाचे. हल्लीच्या पेपर कंट्रोलच्या युगात एकादे पुस्तक छापणे म्हणजे तलवारीवरची कसरत आहे. मी रंगो बापूजी विषयी पुस्तक लिहीत आहे, ही बातमी समजताच, न्यू भारत प्रिंटिंग प्रेस नि नवभारत प्रकाशन संस्थेचे मालक श्रीयुत रघुनाथ दिपाजी देसाई स्वयंस्फूर्तीने माझ्याकडे आले आणि त्यानी प्रकाशनाचा भार उचलला. वेळोवेळी मला त्यानी उत्तेजन दिले, म्हणूनच रंगो बापूजी वाचकांच्या भेटीला येऊ शकत आहे. प्रकाशन कार्य ही धंद्याची बाब असली, तरी श्री. रघुनाथजीनी मला त्या भावनेने मुळीच न वागवता, शुद्ध स्नेहभावनेने जे विविध साहाय्य केले, ते औपचारिक नुसत्या प्रणामाने भरपायी होण्यासारखे नाही. मी त्यांचा ऋणी राहू इच्छितो. अलिकडे माझी प्रकृति क्षीण असल्यामुळे, रघुनाथजीनी दादरला प्रुफे नेणे आणण्यासाठी नवभारत संस्थेचे कार्यकर्ते श्री. वसंतराव ऊर्फ बाबूराव पाथ्रडकर यांची खास नेमणूक केली. बाबूरावजीनी ते काम आपलेच समजून मला हरएक बाबतीत फार सहाय केले. त्यांचे मी आभार मानतो.
पुस्तकातील फोटो चित्रे आणि जॅकेट तयार करण्याचे काम माझे चिरंजीव चित्रकार बाळ ठाकरे आणि फोटोग्राफर चि. प्रल्हाद महाजन यानी केले. ते दोघे माझेच, तेव्हा त्याना माझे आशीर्वाद.
छापखान्यातल्या कामगारानी नि व्यवस्थापक महाशयानीहि ग्रंथमुद्रणाच्या कामी आपल्या कर्तव्याची कसोशी केल्याबद्दल मी त्यांचे सामुदायीक रीत्या अभिनंदन करतो. इतर सर्व अज्ञात सहायकाना कृतज्ञतेने प्रणाम करून हे आत्म निवेदन संपवितो.
- केशव सीताराम ठाकरे
मकर संक्रांत, ता. १४-१-१९४८,
मुंबई नं. २८.
प्रकरण १ ले
रंगो बापूजीचे घराणे
राज्य मऱ्हाठी शिवरायाचे का कायस्थांचे?
कायस्थांच्या रक्तावरती बुरुज उभे त्याचे
प्राणप्रतिष्ठा त्या राज्याची कायस्थ केली
अवतारी शिवमूर्ती वरती मग स्थापन केली
शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याच्या कल्पनेच्या जन्मापासून तो अखेर प्रतापसिंह छत्रपतीच्या हद्दपारीने साताऱ्यास त्या स्वराज्याचा घरच्या नि दारच्या कटबाजानी खून पाडीपर्यंत, छत्रपतींची नि स्वराज्याची पिढ्यानपिढ्या एकनिष्ठेने सेवा करणारी महाराष्ट्रात दोनच घराणी. एक बाळाजी आवजी चिटणिसाचे आणि दुसरे रोहीडखोरेकर देशपांडे दादजी नरस प्रभू गुप्ते याचे या दोन घराण्यातल्या प्रत्येक पुरुषाने स्वराज्यसेवा हाच कुळधर्म मानून, मुत्सदगिरीची शौर्याची नि आत्मयज्ञाची कमाल केली. महाराष्ट्रातच काय, पण उभ्या भरतखंडात त्याला तोड़ नाही नि जोड नाही.
बण्डवाला शिवाजी
मराठी दुसऱ्या यत्तेतल्या लहान मुलांसाठी कै. रावसाहेब विनायक कोंडदेव ओक यांचे महाराष्ट्राचा जितिहास नावाचे एक छोटे इतिहासाचे पुस्तक अभ्यासाला नेमलेले असे. त्यात-
"शिवाजी सोळा वर्षांचा झाला नाही तोच त्याने आडदांड लोकांची संगत धरून देशात पुण्डाइ आरंभिली.``
असे एक वाक्य होते आणि आम्ही मुले ते अगदी मोठ्या आवेशाने नि सुराने घोकंपट्टी करीत असू महाराष्ट्रात शिवाजी उत्सवाची टूम निघाल्यावर अनेक तत्कालीत विद्वानानी ओकांच्या या विधानावर आक्षेप घेतले. अलिकडे कै. राम गणेश गडकरी यानी राजसंन्यास` नाटकात हे वाक्य देहू दफ्तरीच्या तोंडी घालून त्या आक्षेपांचा पुरस्कार केला.
शिवाजीसारख्या प्रातः स्मरणीय स्वराज्यसंस्थापकाला पुंडगुंडांचा म्होरक्या मानणे हा त्या पुरुषोत्तमाचा केवढा अवमान! अशी या आक्षेपकांची, भाबडी भूमिका, कोंदणात चकाकणाऱ्या हिऱ्याची प्रथमावस्था गारगोट्यांच्याच खाणीतली असते. त्याचप्रमाणे कोणत्याहि देशाच्या कोणत्याहि काळाच्या राष्ट्रपुरुषाची प्राथमिक अवस्था गांवगुंडाचीच असते. पुंड नि गुंडच नानाविध पराक्रमानी उघड गुप्त बंडाळ्यानी आडवा येईल त्याला कापून काढून स्वराज्य कमावून राष्ट्राचे उद्धारक पुरुषोत्तम होतात.
कोठेच काही नव्हते, अशा अवस्थेत, दक्खनच्या धुळ्यातून शून्यातून ब्रह्माण्ड काढावे त्याप्रमाणे हिंदवी स्वराज्याचा सोहळा महाराष्ट्राला दाखवणाच्या छत्रपति शिवाजीच्या चरित्राची सुरुवात गुंडपणानेच झालेली आहे. शिवाजीच्या प्राथमिक लोकसंग्रहाल मावळातले निः पुण्याच्या आसपासचे इमानी गांवगुडच होते. अवये पंधरा वर्षांचे वय, पण "ज्यानी महाराजांचे बोलणे परम आदराचे व पराक्रमाचे ऐकावे, त्यास वेध लागून वाटावे की, हे परम थोर आहेत. यांचे संमतें चलाये, हे सांगतील तसे चालाये प्राणहि गेले तरी जावोत परंतु सेवा करून यांचे आशेत मालाये अशी सर्वांची चि वेधून घेतली" मुसलमानी अंगदानी म्हणजे "अंधेर कारभार, बादशाहीमध्ये कोणी मनास आणीत नाही. पैके पावले म्हणजे एकाचे वतन एकास देतील" स्त्रियांवर बलात्कार, हिंदूचे खून मंदिरांचा विध्यंस, गोवा, इत्यादि अनन्वित प्रकार उघड होत असत, प्रतिकाराची धमकच कोणात नव्हती.
शिवाजीने खेडवळ मावळ्यांत अन्यायाची चीड उत्पन्न करून हिंदू राज्याच्या कल्पनेने त्यांच्या सुप्त पराक्रमाला जागे केले. आचरट गावगुंडी न करता, आपल्या देह मनातला ते मुसलमानी जुलमी सत्तेची पाळेमुळे खणून तिला उध्वस्त करण्यात करा, या शिवाजीच्या आदेशाने सारा मावळ प्रात: शिवाजीच्या भजनी लागला. पुण्यास येतांच "बारा मावळे काबीज केली, मावळे देशमुख बांधून दस्त करून पुंड होते त्यांस मारिले’’ देशमुख मराठे नि त्यांच्या देशमुखीचा कारभार पहाणारे देशपांडे कायस्थ प्रभू आणि दफ्तर संभाळायला ब्राम्हण (देशस्थ) कुळकर्णी, अशी मावळातली व्यवस्था होती. देशमुख व्यसनी भांडखोर, मानमरातबासाठी एकमेकात नेहमी मारामारी खून करणारे आणि मुसलमान सुभेदाराची मर्जी सांभाळून स्वताच्या वतनावर चैनीत रहाणारे होते. देशमुखानी शिवाजीला प्रतिकार केला त्याना एकतर चतुरायाने त्याने आपल्या योजनेत मिळवून घेतले. बाकीच्याना नातेगोते न पाहता, दयामाया न करता, पार चेचून काढले.
स्वराज्याची शपथ
मावळातल्या मराठे देशमुखाना मिळवून घेण्याच्या कामी शिवाजीने सर्वाआधी तेथल्या कायस्थ प्रभू देशपाठ्यांची सहानुभूति मिळवून, त्याना आपल्या हाती धरले. असा जो पहिला देशपांडे शिवाजीच्या स्वराज्य स्थापनेच्या कामी राइरेश्वरासमोर बेलभण्डार उचलून शपथपूर्वक सामील झाला. तो रंगो बापूजीचा पूर्वज दादजी नरसप्रभु गुप्ते हा होय. शिवाजीच्या स्वराज्यकार्यात कायस्थ प्रभूचा जो दादून संग्रह झाला. त्याचा उगम दादजीच्या या स्वराज्याच्या शपथकाळापासूनच होय. तेव्हापासून तो महात्यांचे स्वराज्जा रावबाजीच्या पाजीपणाने अंग्रेजाच्या खिशात गडप होईपर्यन्त एकाहि कायस्थाने छत्रपतीशी किंवा स्वराज्याशी बेमानी केली नाही. दादजी नरसप्रभूच्या घराण्याने तर थेट रंगो बापूजीपर्यन्त या इमानाचा एक प्रचण्ड रोमहर्षक इतिहासच अजरामर करून ठेवला आहे. तोच या ग्रंथात लिहायचा आहे.
शिवाजीचे आश्वासन
दादजीला हाताशी धरून, शिवाजी मावळात धुमाकूळ घालीत असल्याची बातमी `राजनिष्ठ’ खोपडे नि जेथे यानी विजापूरला कळविताच, तेथल्या वजिराने कायदेबाज धमकीचा एक सणसणीत खलिता दादजी देशपांड्याला पाठविला (ता. ३० मार्च १६४५), तो असा-
इजत असार दादजी नरसप्रभू देशपांडे कुलकर्णी तप रोहिडखोरे व वेलवंड खोरे यांसि सुखमस अवैन अलफ वजारतमाहब सीवाजीराजे फरजंद शहाजीराजे याणे शहाशी बेमानगी करून तुझे खोरियात रोहिरेश्वरचे डोंगराचे असराण (आसन्याने) पुंडावेयाने मावले वगैरे लोक जमा केला आणि तेथून जाऊन पेशजी किल्यावरील ठाणे उठवून आपण किल्यात सिरला. हाली राजगढ किला नाव करून बलकावला. तोहि बेलवडखोन्यालगत. त्यास लोकाचा जमाव तू सामील असून फिसात करून रशिद राजे मजकूरनिल्हेस देतोस व ठाणे सिरवली आमिनासी रुजू राहत नाहीस, व जमाव बितरजुमा करीत नाहीस. तनखाहि हरदू तपियाचा दिवाणात देत नाहीस (दोनहि पेट्यांचा वसूलहि सरकारात देत नाहीस.) मगरूरीचे जबाब ठाणगे व नाईकवाडियासी देतोस हे जाहीरात आले. त्यास है नामुष्की गोष्ट तुझे जमेदारीचे इज्जतीस आहे. तरी ठाणे मजकुरी आमिनासी रूजू राहणे आणि तनखा साह (जमा) करोन देणे हे न जालियास खुदावंत शाह तुजला विजापुरी नेऊन गरदन मारतील व जमेदारी हककानू चालणार नाही, हे मन समजणे आणि या उपरी दिवाणात रुजू राहणे, छ ११ सफर (राज. खं. १५-२७१-७२.)
वजीरसाहेबांचा हा दमघाटीचा खलिता दादजीकडे आल्याचे वर्तमान शिवाजीला समजताच, त्याने तातडीने दादजीला धीर दिलाशाचे पत्र पाठवून भेटीला बोलाविले. ते पत्र असे-
राजश्री दादाजी नरसप्रभु देशपांडे व कुलकर्णी ता रोहिरखोरे व बेलवंडखोरे यासि प्रति सीवाजीराजे सु। खमस अर्बेन अलफ तुम्हास मेहरबान वजिराचा विजापुराहून हुकूम आला तो ठाणे सिरवलाहून अमिनानी तुम्हाकडे पाठविला, त्याजवरून तुमचे बाप नरसिबाया हवालदिल जाले वगैरे कितेक बहुतेक लि ॥ त्यास शाहासी बेमानगिरी तुम्ही व आम्ही करीत नाही. श्री राईरेर तुमचे खोरियातील आदि कुलदेव तुमचा डोंगरमाथा पठारावर शेंद्रीलगत (सह्याद्रीलगत) स्वयंभू आहे. त्याणी आम्हास यश दिल्हे व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे. त्यास बावास हवाल होऊ नये, खामाखा सांगावा आणि तुम्ही तो कागद घेऊन सिताब हुजूर येणे, राजश्री दादापंताचे विद्यमाने बावाचे व तुमचे व आमचे श्रीपासी इमान जाले ते कायम वज्रप्राय आहे. त्यात अंतर आम्ही व आमचे वंशज लेकराचे लेकरी वतन वगैरे चालविण्याविसी कमतर करणार नाही. हे राज्य व्हावे हे श्रीचे मनात फार आहे. या प्रमाणे बाबाचे मनाची खातरी करून तुम्ही येणे. शा. छे. २९ सफर बहुत काय लिहिणे, (राज. ख. १५-२७५) (१७ एप्रिल १६४५ शुक्रवार)
शिवाजीसारख्या हिंमतबहाद्दर जान पुढाऱ्याने दादजीसारख्याला एवढा दिलदिलासा दिल्यावर, त्याच्या घराण्यातल्या हरएक वंशजाने छत्रपतीच्या शब्दासाठी नि तक्तासाठी प्राण द्यायला भी मी म्हणून सारखे पुढे सरसावावे, यात नवल ते कसले? असले जिवात जीव नि आत्म्यात आत्मा ओतणारे शिवाजीसारखे जवानमदं सानथोरांचा संग्रह करायला सजल्यावर, त्याच्या हिंदूराज्याची बाजी राखायला दादजी बाळाजी नि बाजींचा तुटवडा कशाला पडेल? पडलाच नाही.
सचिवाची कारवायी
शिवाजीच्या अंमदानीत दादजीने आपल्या ‘‘स्वामीपाशी फार शर्थीची चाकरी, हरवक्त हुजूर राहून धारेकऱ्यांत मर्दुमकी, मोठे धाडस जिवाची पर्वा न धरिता केली.’’ राजारामाच्या कारकीर्दीपर्यन्त दादजी हयात होता. पण त्याची स्थिती मात्र फार हलाकीची झालेली होती. रायगड पडला तेव्हा बालराजा शाहू नि मातोश्री येसूबाई यांच्याबरोबर त्याचा मुलगा कृष्णाजी बादशाही छावणीत सेवेला गेला. जिंजीच्या राज्यक्रांतीच्या धामधुतीत, मावळात मुख्त्यार नेमलेल्या शंकराजी नारायण सचिवाने दादजीचे वतन बळजबरीने खालसा करून, शिवाजी महाराजांच्या लेखी वचनावर बोळा फिरवला. बिचाऱ्या दादजीची वृद्धापकाळी अन्नान्नदशा झाली. राज्यक्रांतीचा काळ. धनि जाग्यावर नाही. थोरला पुत्र स्वामीसेवेसाठी स्वामीबरोबरच वनवासात नि बंदीत. केल्या कामाची नि गाळल्या रक्ताची बूज राखणारा कोणी नाही. जेधे देशमूख आणि लोहोकर विरुद्ध बिथरून शंकराजी सचिवाच्या खांकेत घुसलेले. खुद्द धनि छत्रपतीच वनवासात, तेथे त्यांच्या सेवकानी कोणाकडे कसली दाद मागायची?
राजारामाची तंबी
शेवटी चंदीला (जिंजीकडे) स्वताच जावे या निश्चयाने दादजी निघाला तों वाटेतच रांगण्याच्या मुकामाला राजाराम छत्रपतीची गाठ पडली. दादजीची हकिकत ऐकून राजारामाला फार वाईट वाटले नि संतापहि आला. त्याने शंकराजी सचिवाला कडकडीत पत्र पाठविले, ते असे-
राजमान्य राजश्री शंकराजी नारायण पंडीत यासी आज्ञा ऐनिजे, राजश्री दादाजी नरस प्रभू देशकुलकर्णी व गोवकुलकर्णी देहायें तर्फ रोहिडखोरे व वेलवंडखोरे याचे वतन तुम्ही जप्त केले. त्यानी नजराण्याचा ऐवज रायगडी हुजूर कैलासवासी स्वामीपासी जामदारखान्याकडे दिल्हा. त्याजवर वतनाची मोकळीक सर्वा जमेदाराबरोबर मावळ प्रांताची मोकळीक जाली तेव्हा याचीहि केली. पुढे तुम्ही सर्जेराऊ जेथे देशमुख यांचे तर्फेने आकसामुळे याचे वतन आपल्यास जेथे याजपासून करून घेतले, देविसी खबर प्रभू देशपांडे याणी पनाल्याचे मुकामी जादून राजश्री रामचंद्रपंत अमात्य यास सर्व चाका समजाऊन त्यानी त्याची तकरीद घेवून हुजूर चंदीचे मुकामी तेव्हा र॥ केली. नंतर याचे वृत्तीचा बंदोबस्त करावा तरी तुम्हीच अफलादीचा विशेष. वतन बेवारसी, आपल्यास द्यांचे म्हणोन विनंती पत्र संकाजी ढग्याबरोबर लिहिले.
तेव्हा स्वामीनी राजकारणावर नजर ठेवून बेवारसी वतन असल्यास तुम्हास देसी आल्यावर चौकसी करून देता येईल असे लिहिले असता त्याचे पत्रावर तुम्ही प्रभूवर बलात्कार करून घरांतून कागद नेले. त्यास हाली दादाजी प्रभू हुजुर किले रांगण्याचे मुसामी चंदीस येण्याबद्दल आले. तो स्वामी देसी येता भेट घेतली. सर्व कळविली. त्यास तेच वेळी तुम्हास पत्र लिहिले की हे वतन घ्यावयाचे नाही. त्याचे वतन त्यास देवाये. अस उरून है आज्ञापत्र तुम्हास सादर केले असे. तरी देशकुलकर्णे व गायकुलकर्ण हरदु खोरी प्रा मजकूरची तुम्ही व जेधे व लोहकर वगैरे मिळोन हे वतन नाहक घेतले. याचे चिरंजीव कृष्णाजी प्रभू अशा अडचणीचे प्रसंगी स्वामीस संकट समझ बादशहानी चरंजीव शाहू व कबिले नेले त्यापासी चाकरीवर हजर असता मागे त्याचे वतन दरोबस्त घेता हे तुम्हास उचित एकंदर नाही.
तरी याउपरी याचे वतनाचे कागदपत्र नेले त्यासुधा परत देऊन याचे वतन याजकडे चालत असल्या प्रो चालवणे आणि खासा स्वारी तिकडे येताच येऊन भेटणे, यानी कैलासवासी थोरले राजश्री स्वामीपासी फार शर्तींची चाकरी हरवत हुजूर राहून धारकरीयात मची मोठे धाडसे जिवाची परवा न धरता केली व स्वामी एहि (यांही) विजापुरी बंद सोसिले त्या काली सर्जेराव व खंडोजी खोपडे व बांदल देशमूख याणी तुरुक लोकांसी मिळून फिसात केली आणि अडचण स्वामीस फार केली. ते वेळी खंडू खोपडे व बांदल धरून मारिले. सर्जाराव कैद केला. त्या निमिती आकस धरून तुम्हास गैरवाका मजकूर समजाऊन त्याचा व याचा अकस असता ही वृत्ती तुम्ही जबरदस्त म्हणोन करून देता आणि तुम्ही पत्रे करून घेऊन घेता. त्यास याचे तुम्हास देण्यास जेधे यास अधिकार नाही व तुम्ही करून घेण्यास अधिकारच नाही. पेशजी व हाली या जातीने फार . मधु॑म्या करून राज्य मेळविले. स्वामीकरिता खराब जाले व मारले गेले. असे यत्ने करून दिवस पूर्वीपासून काढले असता तुम्ही सरकारची चार माणसे हाती घेऊन मलाई केली व करिता यानी चाकरी जमाव करून व जातीनेहि प्रथमपासून केली व करीत आहे.
ती एकीकडे जाऊन आपले मनी मोठेपणा वागविता व पाहिजे (ते) करिता, परंतु तुम्ही याचे वृत्तीस गल पडण्याचा समंध एकंदर नाही. सबब हे वतन परत देणे. मावळ मजकुरी स्वारी येण्याचे पूर्वी पतन दिल्याचा मजकूर लिहिणे. याउपरी वतन न दिल्याचा बोभाटा आल्यास तुमचे अस व पदास धका येईल असे स्वामीस भासत आहे. व पुढे नाना प्रकारच्या अडचणी तुम्हास अशा करणीच्या येतील. कारण चिरंजीद (शाहू) काले करून तरी श्री देसी आणील. तेव्हा संकटी जी माणसे उपयोगी पडली त्यांच्या तसनसी आम्ही करविल्या. हे इकडे यावे. त्याचे चित्त द्वेश यावा व राज्यकर्त्यास इनसाफ पाहणे जरूर. त्यात हे तरी अविचाराचे कलम, भलाई जाली ती सारी आमची एकीकडे जाऊन असी करणी तुम्ही केली यात स्वामीदोहाचेध करणे. ते (शाहू) मुख्य, सर्व राज्यास अधिकारी. आम्ही करितो तरी त्याचेसाठीच आहे. प्रसंगास सर्व लोकास तिकडेच पाहणे येईल. व यागतील. हे कारण ईश्वरीच नेमिले आहे. उगीच भलते भरी न भरणे. पुढे ऊर्जित होय ते करणे. हे न केलिया केले कामाची फळे ज्याचे ते भरतील असी श्रीची इच्छाच असली तरी तुम्हीतरी का समजाल? तरी नीट चालीने वागणे म्हणजे पुढे सर्वोपरी ऊर्जीताचेच करण जाणिजे, जाणिजे निदेश समक्ष प्रो असे तेरीख १७ सफर सुग समान तिसैन अलफ. [२८ एप्रिल सन १७०८]
राजारामाच्या या पत्राला शंकराजी सचिवाने धूपसुद्धा दाखवला नाही. पुढ शाहू दक्षिणेत परत आल्यावरहि या प्रकरणात त्याने चौकशी करावी म्हणून दादजीच्या मुलाने (येसप्रभूने) खटपट केली. "मावळप्रांती शक्राजी नारायण पंडत याणी जबरीने दादाजी नरसप्रभू देशपांडिया... कृष्णाजी प्रभूचा बाप हा कदीम जमेदार असता त्याचे वतन घेतले व आणखीहि बहुत जमेदार व रयत लोकांच्या तसनसी केल्या. ये बाबे पडत यास शाहूने बोलावले असता न आले. हिरकणी खावून मेले.’’ सारांश, पंतसचिवाने संथपणे पचविलेले दादजीच्या इमानाचे इनाम वतन त्याच्या घराण्याला, रंगो बापूजीला सुद्धा, पुन्हा कधीच लाभले नाही. शंकराजी नारायणाचा वतनखाऊ खराटा मावळातल्या अनेक इमानदार लोकांच्या वतनांवर फिरून फिरूनच भोरच्या पतसचिवी संस्थानाची उभारणी झालेली आहे. अर्थात्, या संस्थानाच्या पायांत किती शिवभक्तांच्या गर्दना गाडलेल्या असतील आणि किती गोरगरिबांच्या तळतळाटावर या संस्थानचे ग्रामणी ऐश्वर्य लकलकत आहे. याची वाचकानीच कल्पना करावी.
वतनासाठी वंशजांची धडपड
शिवाजीने दादजीला दिलेल्या वतनाला चांगला मुहूर्त लागला नव्हता, असे म्हणावे लागते! कारण शिवाजीच्या हयातीतच दादजीचा गुमास्ता बाबाजी सिवदेव सोनटक्के याने कागदोपत्री घालमेल करून वतन गिळण्याचा यत्न केला होता. पण ती गोष्ट उघडकीला येताच, शिवाजीने सोनटक्याला राजगडावर कैद करून चौदावे रत्न दाखविताच स्वारीने यजितपत्र लिहून देऊन (शके १५४५ मार्गशार्प शुद्ध ३) प्रावस्थित घेतले. [परिशिष्ट पहा.) ब्राम्हण गुमास्त्यानी यजमानांची आडनावे घेऊन मावळातल्या अनेक कायस्थ प्रभू देशपांड्यांची वतने गडप केलेली आढळून येतात.
शाहूच्या कारकीर्दीत कृष्णाजी नि येसाजी या दादजीच्या दोन पुत्रानी वतनासाठी पुन्हा खटपट केली. तोवर दादी दारिद्याने ग्रस्त होऊन मृत्यूहि पावला होता. दादजी हा नरसप्रभूचा दत्तक पुत्र असूनहि तो अस्सल (अवलाद) नव्हे, अफलाद आहे, तेव्हा ते वतन सरकारजमा ऊर्फ सचिवायस्वाहा करायला हरकत नाही. अशी शंकराजीने कायदेबाजी लढवलेली होती. दादजीचा काटा काढण्यासाठी ‘तुला तीन गावचे कुणकारी गावात एक घर नि त देती वतनाचा राजिनामा लिहून दे, दत्तपूत्र म्हणऊ नकोस, अफलाद म्हणवीत जा,` असा सचिवाने दादजीला नि त्याचा पुत्र येसाजी याला जबरीचा सवाल टाकला. तो त्यांनी नाकारताच सचिवाने त्यांचे घरदार लुटले, त्याना कोंडून मार ज़बरदस्ती केली आणि पोलिशी समजुतीचा हवा तसा कागद जोरीने लिहून घेतला.
सन १७०८ त शाहू देशी परत आल्यावर, कृष्णाजीचे वतन त्याला बिनबोभाट परत देण्याचा बंदोबस्त करून ‘इनसाफ बराई खुद जातीने पहावी.’ असा एक बादशाही खलिता (१६३० शके ज्येष्ठ वद्य ४ चा कृष्णाजीने शाहूला सादर करविण्याची खटपट केली होती. त्यावर सन १७१९ (शके १६४१ फाल्गुन शुद्ध ४) चे एक पत्र शाहूने दत्ताजी सिददेव राजाज्ञा याला लिहून, या वतनाचा बंदोबस्त करण्याविषयी लिहिले. तरीहि काही दाद लागल्याचे दिसत नाही. पुढे कृष्णाजीचा मुलगा रामाजी आणि येसाजीचा मुलगा चिटको नानासाहेब पेशव्याकडे तक्रार घेऊन गेले. त्या वेळी उत्तर हिंदुस्थानच्या स्वारीचे राजकारण पुण्यास शिजत होते. ‘सध्या तुम्ही उत्तरेच्या स्वारीला चला. परत आल्यावर तुमची भानगड मिटवतो.` असे नानासाहेबाने सांगितल्यावरून रामाजी नि चिटको तिकडे गेले आणि पानपतावर खलास झाले.
रामाजीचा मुलगा बापूजी यानेहि थोडीशी खटपट केली. पण तिचाहि काही उपयोग झाला नाही. नंतर रंगो बापूजीने अखेरचा जोर केला. ती हकिकत यापुढे सांगायची आहे.
रंगो बापूजीच्या चरित्रावर पुणेरी अवकल पाघळणारे काही चित्पावन संशोधक, `रंगो बापूजी एकसारखा आपल्या वतनासाठी जीव टाकीत होता. त्याच्या प्राप्तीसाठीच त्याने हजार उलाढाल्या केल्या.’ अशा अर्थाचे शेरे मारून शंकराजी नारायण गांडेकराच्या पंक्तीला ते बसले आहेत. वतने, इनामे, जहागिरी, संस्थाने, अलिकडची पेनशने यांच्यासाठी पूर्वी नि आजकाल कोण जीव टाकीत नाही? सारेच टाकतात. सांगली मिरजेचे पटवर्धन पेशव्यांचे नोकर. एकट्या बापू गोखल्याखेरीज कोणत्या चित्पावन सरदाराने आपल्या पेशवे धन्यासाठी खाल्ल्या मिठाचे चीज केले, हे ते चित्पावन संशोधक सांगतील काय? उलट ईस्ट इंडिया कंपनीच्या कारस्थानांची सद्दी जोरावर दिसताच रावबाजीने शेणाच्या पणत्या पाजळण्यापूर्वीच त्याच्या एकूणएक चित्पावन सरदारानी बनिया कुंफणीशी संगनमत करून, तिचा पाठिंबा पोर्टिया मिळविला. दक्षिण महाराष्ट्रातली सगळी भटी संस्थाने आंग्लाई पाठिव्याची नि निमकहरामीची प्रतिके आहेत.
कांही वर्षापूर्वी मुंबईचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन सांगली संस्थानच्या भेटीला गेले होते. त्याना दिलेल्या मानपत्रात सांगलीचे विद्यमान अधिपति श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यानी म्हटलेले आहे की` पेशवाई नष्ट होण्याच्या पूर्वीपासूनच आमच्या संस्थानाचा नि इंग्रेजांचा स्नेहसंबंध जुळलेला आहे. शिंदे, होळकर, गायकवाड या पेशव्यांच्या बडचा सुभेदारांनी आंग्रेजांच्या सुलतानीला मुलतानी मुजरे करूनच आपल्या सत्तेच्या नि वंशजांच्या बडेजावी टिकावाची सोय करून ठेवली आहे ना? रंगो बापूजीच्या पूर्वजाला शिवरायाने दिलेले टीचभर जमिनीच्या तुकड्याचे वतन हरामखोरीचे नव्हते. इमानदारीचे ते इनाम होते. मावळात प्रथम दादजी नरसप्रभू शिवाजीला स्वराज्यस्थापनेची शपथ देऊन उठला, म्हणूनच सारा मावळ प्रांत नि तेथले कायस्थप्रभू तरुण जवान शिवाजीच्या झेण्ड्याखाली जमा झाले. त्या लोकसंग्रहाचे शिवाजीने दिलेले ते अभिमानास्पद बक्षीस होते. ते सचिवाने हरामखोरी करून हिसकाऊन तसे परत मिळण्यासाठी रंगो बापूजीने खटपट केली. यात स्वार्थ कोठे आला?
आज चालू घटकेला (सन १९४६-४७) अंग्रेज बहादुरांना भारतीय जनता, ‘चले जाव` हुकुमाने दरडावीत असता, आणि संस्थानिकांचे जन्मसिद्ध अवतारीपणाचे नि वारसाचे हक्क आम्ही जुमानणार नाही, असे पंडित जवाहरलाला नेहरू, मध्यवर्ति सरकारचे पंतप्रधान नात्याने, धमकावीत असता, ‘आता आमचे पुढे काय होणार?’ या दहशतीने यच्चायत देशी संस्थानांचे छोटे मोठे राजे आपल्या जिवाचा हुआ कायदेबाजीच्या फाट्यावर भाजून घेत आहेत ना? हिंदुस्थानातील सगळी संस्थाने या ना त्या जातीच्या हरामखोरीनेच जगली नि पुढे जगण्याची लंगडझाड करीत आहेत. महाराष्ट्रातली पटवर्धनादि चिपटीमापटी तर उघडउघड धन्याच्या चितेवर पावन झालेली आहेत. आपले संस्थान हातचे जाणार की काय, या विवंचनेने त्यानाह जर आता झोपा येत नसतील, तर विचान्या रंगो बापूजीने आपल्या टीचभर वतनासाठी स्वताच्या स्वराज्यनिष्ठ घराण्यावर झालेल्या अन्यायाच्या भरपाईसाठी शेवटच्या छत्रपतीपर्यंत आणि अलपिष्टनापर्यंतहि हाका आरोगांचा ओरडा केला तर त्याला काकबुद्धीने दोष देणाऱ्याना म्हणावे तरी काय?
प्रकरण २ रे
रंगो बापूजीचा पूर्वरंग
रंगो बापूजीच्या जन्म मृत्यूच्या निश्चित तारीख सालांचा पत्ता नाही. आपल्या हयातीत त्याने पर्वतासमान पत्रव्यवहाराचा ढीग रचला. अनेक इंग्रेजी मराठी (मोडी लिपीत) पुस्तके लिहून छापली नि हिंदुस्थानात नि तमाम इंग्लंडात फैलावली. चुकूनसुद्धा कोठेहि त्याने आपल्या जन्मतिथीचा उल्लेख केलेला आढळत नाही. छत्रपति प्रतापसिंह आणि रंगो बापूजी यांची जीवनचरित्रे एकमेकात सरमिसळ: मिसळलेली आहेत. प्रतापसिंहाचे नांव निघताच रंगो बापूजीचे चरित्र सिनेमासारखे नजरेपुढे नाचू लागते.
वाल्मिकाने श्रीरामचरित्र अजरामर केले, तसे रंगो बापूजीने प्रतापसिंह छत्रपतीचे चरित्र न चारित्र्य यूरप-आशिया खंडात गाजविले. प्रतापसिंहाच्या अंगदानीच्या प्रथमार्थात जे अनेक मोठमोठे मुत्सदी, लढवय्ये आणि मसलतगार स्वराज्याच्या पुनर्घटनेसाठी सर्वस्वावर तुळशीपत्र ठेवून झगडले, ते सारे उत्तरार्धात अंग्रेजी पटाखाली सपरिवार चेचले जाऊन, अखेर एकटा रंगो बापूजीच छत्रपतीचा प्रतिनिधी वकील म्हणून आंग्रेजी दगाबाजीशी प्राणांतीच्या टकरा द्यायला शिल्लक उरला. या विस्तीर्ण मुकाबल्याचा पार्श्वभाग समजण्यासाठी थोडेसे `मागे जाऊन, छत्रपति, पेशवे नि आंग्रेज यांचे एकमेकाना भीत करण्यासाठी कसकसे डावपेच चालू होते, याचा धावता आढावा या प्रकरणांत घ्यायचा आहे.
नोकराच्या कैदेत धनी
सन १७७७ साली छत्रपति रामराजे यानी `धाकटे शाहू ऊर्फ आबासाहेब महाराज याना दत्तक घेतले. हे प्रतापसिंहाचे पिते. शाहू जात्या तल्लख बुद्धीचा शरिरांने सुद्दढ सशक्त आणि स्वभावानेहि मानी होता. पण गादीवर आल्यापासूनच त्याची सारी हयात सातारच्या किल्ल्यावर अटकेदाखल खर्ची पडल्यामुळे त्याची बुद्धी चमकायला कसलाच अवसर मिळाला नाही. पूर्वीच्या पेशव्यानी छत्रपति मालकांच्या नाचा सर्व बाजूनी आवळलेल्याच होत्या. पण शाहू गादीवर येताच, नाना फडणिसाने त्याचा कोंडमारा विशेषच केला.
``त्यांचे खर्चाचे ऐवज परभारे येणे, ते कशास पाहिजे? जो ऐवज देणे तो पुण्याहून नख्त पाठवावा. कारखाने व कारखानदार यांचा खर्च पांचसहा लक्ष रुपयांचा ऐवज पोचत होता. त्यास लाख रुपयांत खर्च आटोपतो. म्हणून पागा, हत्ती सर्व पुण्यास आणिले देशमुखी व खासगी गांव यांचे ऐवज पुण्यातच घेऊ लागले. महाराजांची अमर्यादा करून चौकी पहारा ठेवून, राजमंडळाचे लोक कोणी जाऊ नये, ऐसे केले. चाकरीच्या बायका दोनचार व लेकावळे दोनचार खेरीज करून सर्वांच्या अडेश्री बंद केल्या. राजपत्रे कागदपत्र होणे याचे काही एक कारण नाही. या प्रमाणे बंदोबस्त केला. (रिया. उ. नाग ३ पान ५१३-१४)
वाचकहो, पाहिलात ना हा पेशवाई स्वामीनिष्ठेचा प्रकार? ‘धन्याला धतुरा नि चोराला मलिदा’ ही म्हण मला वाटते. पेशवाई कारभारावरून रूढ झालेली असावी.
सवाई माधवरावाने नाना फडणिसाच्या काचाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर, बारभाईच्या नि रावबाजीच्या कारकीर्दीत भटी राजकारणाचा पुण्याला भलताच एळकोट उडाला आणि आग्रेजी कोळ्यांच्या जाळयात रावबाजी एकसारखा अडकतच जाऊ लागला. हे पाहून शाहूचे माथे सणाणू लागले आणि तो मऱ्हाठी स्वराज्याच्या भवितव्याचा विचार करू लागला पण नुसता विचार करून काय उपयोग? हातात ना सत्ता, ना सैन्य, ना खजिना स्वराज्यातल्या टिपाड जहागिरदार इनामदाराना जेवढे स्वातंत्र्य सत्ता नि पैका आणि प्रसंग पडल्यास शेपांचशे बारगीर जमविण्याची हिम्मत होती, तेवढीहि बिचाऱ्या या शाहू छत्रपतीला नव्हती.
चतुरसिंगाचा चरफडाट
शाहूचा (औरस भोसले घरचा) धाकटा भाऊ चतुरसिंग भोसले हा शाहूजवळ साताऱ्यासच असे. तक्तनशीन थोरल्या भावाची सर्वांगीण हतबलता आणि परघरमे लछमी दास नात्याने रावबाजीने चालवलेली स्वराज्याची धूळधाण पाहून चतुरसिंग सारखा चरफडत असे. खरोखर, शाहूच्या बदला चतुरसिंग छत्रपति म्हणून गादीवर आला असता, तर मऱ्हाठ्यांच्या इतिहासाला निराळेच सामर्थ्यवान वळण लागले असते, हा देशी परदेशी बखरकारांचा अभिप्राय वायगा नाही. नोकराच्या कैदखान्यात मळमळीत जिण्याने कणकण झिजून मरण्यापेक्षा एकादी जबरदस्त टक्कर देऊन त्याचा तरी खातमा करावा अथवा स्वता तरी मरून जावे. असे वरचेवर तो शाहूला सुचवीत असे.
तसे पाहिले तर शाहूच्या आवती भवती चतुरसिंगाच्या बरोबरीचे येलोजी राजे नि संभाजी राजे मोहिते, कुशाबाराजे नि दुर्गाजीराजे महाडीक हे आप्तांपैकी आणि इतर किती तरी प्रभू नि देशस्थ ब्राम्हण तरुण मंडळी छत्रपतीसाठी हव्या त्या धाडसात स्वताच्या प्राणाचे दिव्य करायला सिद्ध होती. शाहूला हे समजत होते. पण सारी हयात बंदिवासात गेल्यामुळे कमजोर मनाच्या शाहूला या क्रांतिवादी तरुणांच्या धडाडीला एकाकी हो म्हणण्याची छाती होई ना. आणि तेहि वाजवी होते. क्रांतीसाठी धाडसी मंडळी तयार असली तरी क्रांति वठवायला जी अनेकविध साधन सामुग्री लागते. ती तरी उपलब्ध हवी ना? मुख्य सामुग्री पैशाची आणि तसाच छत्रपतीजवळ फाक्या! एका लौकिकी मऱ्हाठी म्हणीने सांगायचे तर, छत्रपतीजवळ कपाळी टेकायला छत्रपतिसुद्धा मिळण्याची पंचाईत!
पण क्रांतिवाद ही चीज अथवा भावनाच अशी जिव्हाळ्याच्या जादूची आहे की माणूस तिच्या नादाने वेडा झाला म्हणजे तो असले व्यवहारी विवेकाच्या गुंतागुंतीचे धागेदोरे सोडवीत बसत नाही. जिवावर उदार होऊन क्रांतीच्या गर्जना करीत तो घराबाहेर पडतो. हां हां म्हणता त्याच्या भोवती समविचारी मंडळी भराभर गोळा होते आणि जयापजयाची पर्वा न करता, तो क्रांतिवीरांचा संघ प्रतिकाराच्या दणादण टकरा देऊन, आजूबाजूचे वातावरण हादरून सोडतो. मऱ्हाटी स्वराज्याच्या पडत्या काळी, काळालाहि कलाटणी देणारे अनेक धाडसी क्रांतिवीर महाराष्ट्रात निपजले. राष्ट्रासाठी देहमनाचा पुरोळा करून झिजले. पण त्याना यश न मिळाल्यामुळे बोर सदराखाली ते सारे तडफडते जीव इतिहासजमा झाले!
पेशव्याला पायबंद ठोकून, आंग्रेजाना भारतपार हुसकावण्याचा चतुरसिंहाने प्रचंड व्यूह रचला. शेकडो मित्रांचे पाठबळ मिळवले. अखिल भारतीय संघटनेसाठी उमा हिंदुस्थान पायदळी तुडवला. दिल्लीला जाऊन लेक नि मालकम यानाहि स्वता दम मरला. पण काळचक्रच उलटले होते, त्याला तो तरी काय करणार? या वनवासात असतानाच, छत्रपति शाहू वारला आणि रावबाजीने आपल्या पत्नीला नि मुलाला कैद केले, अशी बातमी चतुरसिंगाला लागली. महाराष्ट्रात तो परत येत असता त्रिंबकजी डेंगळ्याच्या दगाबाजीला तो कसा बळी पडला आणि कांगोरीच्या तुरुंगात अखेर मरणाधीन झाला, तो इतिहास वाचकानी परिशिष्टात पहावा.
`तुम्ही शाहूच, मी थोरला बाजीराव.`
धाकटे शाहू महाराज ४ मे १८०८ बुधवारी मरण पावले. तेराव्याच्याच दिवशी १६ मे १८०८ सोमवार रोजी, रावबाजीने प्रतापसिंहाला गादीवर बसविले. `शिक्का बदलेल, तेव्हा आपणहि शाहू नावानेच राज्य करावे, आपण थेट थोरले शाहू महाराज मी समजतो आणि मीहि थोरल्या बाजीराव साहेबाप्रमाणे आपली सेवा करून राज्याची बढती करीन, स्वामीचा वरदहस्त असावा` वगैरे गोडगोड बोलून रावबाजीने प्रतापसिंहाला आणि त्याच्या मातोश्रीला अगदी गारेगार करून टाकले. झाले गेले सारे विसरून जा, मी आपला निष्ठावंत सेवक आहे. माझ्यावर स्वामीनी कृपादृष्टी ठेवावी, वगैरे भरपूर साखर पेरून मायलेकराला रावबाजीने अगदी खूष करून टाकले.
प्रारंभी काही दिवस सारे ठाकठीक चालवले. पण धोक्याच दिवसांत रावबाजीची ‘पालकगिरी’ आपला प्रभाव गाजवू लागली. या वेळी प्रतापसिंहाचे वय अवघे १५ वर्षांचे होते, अर्थात सारा कारभार पेशवेच पहाणार. कारभार म्हणजे काय? तर ‘मागील अंकावरून पुढे चालू` होणारा कैदखानाच! रामबाजीने सातारचा कारभार त्रिंबकजी डेंगळ्याला सांगितला. त्याच्या तर्फे काशीपंत बंदरे नावाचे ब्राम्हण गृहस्थ सातारा किल्ल्याचे ‘जेलर’ किल्लेदार म्हणून काम पाहू लागले. मोठा आग्यावेताळ होता लेकाचा! काही चारपाच ठरावीक मंडळी शिवाय इतराना छत्रपतीला भेटायची. सोय उरली नाही. किल्ल्यावर आजूबाजूला दिमतीला म्हणून ठेवलेले सारे लोक त्रिंबकजीचे हेर असायचे. प्रतापसिंह काय बोलतो, त्याची आई काय बोलते करते, याची बित्तंबातमी जेव्हाच्या तेव्हा काशीपंताकडे जायची. या राजमंडळातील चिटणीस प्रभृति लोकानाहि किल्ला वर्ज.
दरवाजावर कडेकोट पहारा. पेशव्याकडून नेमणूक येईल. तेवढ्या पैशात खाये प्यावे नि किल्ल्यावर फेरफटका करावा. हेच नि एवढेच छत्रपतीचे जीवन होते. मातोश्री माईसाहेब (आनंदीबाई) दूरदर्शी, चाणाक्ष आणि तडफदार होत्या. पण त्यांचाहि काही इलाज चाले ना. नवऱ्याला पेशव्यानी कसा वागवला नि नागवला. अखेर चतुरसिंग दिराचाहि घात कसा केला, वगैरे घडामोडी तिने प्रत्यक्ष पाहिल्या होत्या. विवेकाने सर्व अपमान गिळून, तरूण छत्रपतीला ती गुप्तपणाने शहाणपणाच्या चार गोष्टी नित्य शिकवीत असे. छत्रपतीला निर्बुद्ध ठेवण्याचे कारस्थान तर पेशव्याने मोठ्या बंदोबस्ताने चालविले होते. आपला पुत्र निरक्षर राहू नये, म्हणून माईसाहेब त्याला पहाटे दोनअडीच वाजता उठवून शिकवायची आणि चार साडेचारला परत निजवायची. म्हणजे आजूबाजूच्या कोणाच्या लक्ष्यात ते येत नसे.
छत्रपतिनिष्ठांची गुप्त खलबते
सहा वर्षे किल्ल्यावरील हा कोंडमारा बाहेरचे अनेक छत्रपतिनिष्ठ लोक, आज कमी होईल, उद्या कमी होईल, अशा आशेने सहन करीत होते. अखेर, काहीतरी निर्वाणीचा तोडगा काढल्याशिवाय, छत्रपतीची धडगत दिसत नाही, अशा हेतूने, चाफळचे स्वामी (रामदासांचे दण्डधारी) एक दिवस (सन १८१४ साली) बोरगांवास चिटणिसांकडे आले. या मसलतीत विठलपंत, दाजीबा उपाध्ये, रंगोपंतदादा, सेटिया देवपुजे आणि रंगो बापूजी वगैरे मंडळी होती. त्या वेळी अग्रिजांचा अलपिष्टनसाहेब पुण्यास गारपिरावर ठाण मांडून बसला होता आणि पुण्याच्या पेशवाई राजकारणाच्या पायांत त्याने अनेक भानगडींचे लंगर अडकविले होते. सन १८०२ सालच्या वसईच्या तहाने पेशवा अंग्रेजांचा जवळजवळ मांडलीकच बनला होता.
अशा वेळी युक्तीप्रयुक्तीने खुद्द अलपिष्टनाची पुण्यास भेट घेऊन छत्रपतीची हालहवाल त्याला सांगावी आणि छत्रपतीची सुटका होऊन दौलत त्यांचे हाती येईल, याचा काही पर्याय सापडतो का ते पहावे, यावर या बोरगांवच्या बैठकीत खूप खल झाला. सातारा ते पुणे प्रांतात पेशव्याचे नि त्रिंबकजीचे हेर रस्त्यावरील खड्यागणिक फैलावलेले असता, पुण्याला जाऊन साहेबाची भेट घ्यायचे काम बिकट नि धाडसाचे होते. ते करायला बैठकवाल्यानी रंगो बापूजीची निवड केली. रंगोबा पक्का धूर्त, प्रसंगावधानी, वेळ मारून नेणारा, नाना वेषांतरे करून निसटणारा, हव्या त्या सबबीवर हवा तेथे घुसणारा आणि मिठ्ठास नि मुद्देसूद गोड बोलून कार्यभाग साधणारा असामी होता. पुण्याची मसलत सफाईत पार पाडील तर तो रंगोबाच. या धोरणाने त्याची नेमणूक केली.
पण इतक्यात एक संधी चालून आली. पेशव्याचे कारभारी चिंतोपंत देशमुख यांचे चिटणिसाकडे एक जरूरीचे पत्र घेऊन स्वार आला. अलपिष्टनकडे वाडीकर सावंताने असे बोलणे लावले की आम्ही काही पेशव्यांचे चाकर नव्हत. आम्ही स्वतंत्र, आमची दौलत स्वतंत्र, तेव्हा पेशव्यांच्या बन्या वाईटाशी आमचा काही संबंध नाही. या बाबतीत तुमच्याकडे काही कागदपत्र असल्यास ते घेऊन ताबडतोब पुण्यास यावे, अशी श्रीमंतांची आज्ञा त्या पत्रात होती. चिटणीसानी दप्तरातून या प्रकरणाचे कागद काढून पुण्याला जाण्याची तयारी केली. बरोबर रंगो बापूजीला अगत्याने घेतले.
चिटणीस नि रंगोबा पुण्याला
चिंतोपंत देशमुखाला भेटून दोघानी रायबाजीची भेट घेतली नि कागद दिले. रावबाजीने ते अलपिष्टनास दाखविले. कोठे मिळाले हे कागद, असे अलपिष्टनाने विचारले. छत्रपतीचे चिटणीस हे मऱ्हाठशाहीचे कदीम दप्तरदार त्यानी आणून दिले. असे रावबाजीने सांगितले. चिंतोपंताकडून ही हकिकत चिटणीस रंगोबाला समजताच, अलपिष्टन साहेबाची नि आमची भेट कशी होईल याचा मार्ग सांगा, असे दोघानी चिंतोपंताला विचारले. तो म्हणाला बाबाजी आंगरे याचे कारभारी आहेत. त्यांच्याकडे साहेब नेहमी येत जात असतो. त्याला भेटल्यास तुमचे काम होईल. नंदीची आराधना करण्यापेक्षा थेट शंकरालाच गाठले तर काय वाईट या इराद्याने रंगोबाने चिटणिसाला एकदम बाबाजी आंगऱ्याकडेच नेले. त्याला हेतू सांगताच तोच त्याना घेऊन थेट अलपिष्टनाकडे गेला आणि दोघांची रुजुवात करून दिली. कारभारी राहिला एका बाजूला.
अलपिष्टनाशी रंगोबाचे सूतोवाच
‘‘साहेबानी विचारिले की, माहाराज सरकारानी पेशव्यांस दौलत कशी दिली व कोण्ही कोण्ही दौलतदार वगैरे महाराजापासी राहून चाकरी कसी केली. हे सविस्तर आम्हास कसे कळेल?’’ चिटणिसानी सुचविले की, साहेबानी हा मजकूर श्रीमंतास सांगावा आणि त्यानी परवानगी दिली तर सविस्तर हकिकत शिवाजी महाराजांचे वेळेपासून तो आतापर्यन्त बखर लिहून आणतो. रावबाजीचे काय? साहेबाचा शब्द जाताच त्याने बखर तयार करण्याची परवानगी दिली. पुण्यासच चारपाच दिवस रात्र खपून बळवंतराव मल्हार चिटणिसाने मुद्देसूद तपशीलवार बखर लिहून तयार केली आणि रंगो बापूजीला ती घेऊन गारपिरावर साहेबाच्या भेटीला पाठवून दिला.
या भेटीत रंगोबाने संधि पाहून, प्रतापसिंह छत्रपतीच्या कोंडमाऱ्याविषयी साहेबाला सविस्तर वृत्त सांगितले. `हरएक यत्न करून महाराजांची आम्हाला सुटका करून त्यांची दौलत त्यांच्या हाती येईल, असे करावयाचे आहे.’ हा मुद्दा ऐकून अलपिष्टन म्हणाला, `तुमचा हेतू रास्त आहे. पण तुमच्या खटपटीना छत्रपतीचा पाठिंबा आहे का नाही?` त्यावर रंगोबाने जबाब दिला की ‘छत्रपतींची नि आमची गाठभेट होण्याचीच पंचाईत?’ तेव्हा साहेबाने सूचना केली की, ‘धाडसाशिवाय काय होणार आहे? कसेहि करून छत्रपतीची या राजकारणाबाबत आम्हाला चिट्टी घेऊन या, मग विचार ठरवता येईल.’
किल्ल्याचा भेद घेण्याचे कारस्थान
रंगोबा नि चिटणीस परत जैतापुराला आले. चाफळच्या स्वामीना बोलावून घेतले. मसलतीची बैठक बसली. किल्ल्यावर रोज निर्धोक जाणारे येणारे कोण? तर तात्या नारोळकर वैद्य, कृष्णाबाई नरसू काकडे आणि खंडेराव महाराजे शिर्के. मंडळी सातारला येऊन नारोळकर वैद्याला भेटली आणि इंग्रेजांकडे राजकारण चालू केले. असा गुप्त संदेश प्रतापसिंहाकडे त्याच्याबरोबर पाठविला. मसलत करणाऱ्यांपैकी कोणीतरी किल्ल्यावर आला पाहिजे, म्हणून रंगोपंतदादानी नरसू काकडे, नारोळकर प्रभूति मंडळीशी रंगो बापूजीचा परिचय करून दिला आणि उद्या त्याला किल्ल्यावर पाठवतो, तो नारोळकराना येऊन गुप्त येषाने भेटेल. आज संध्याकाळी महाराजाना तुम्ही गुप्त सूचना देऊन ठेवावी आणि उद्या रंगोबा येताच, साहेबास खात्री पटण्यासाठी महाराजांचे हातची चिठी घेऊन त्याच्याजवळ द्यावी, असे ठरले.
मंगळाईच्या दर्शनाला गोसावी चालला
चाफळकर स्वामीनी आपली कफनी झोळी माळा उतरून रंगोबाला गोसाव्याचा वेष दिला आणि स्वता प्रतापसिंहाला खात्री पटण्यासाठी स्वदस्तुरभी एक चिठी दिली. जयजय रघुवीर समर्थच्या गर्जना करीत रंगोबा गोसावी किल्ल्याच्या दरवाजावर येताच पहारेक-यानी चौकशी केली. `बाबा, श्री मंगळाई देवी तुझे कल्याण करील. मी तिच्याच दर्शनाला जात आहे.’ अशी बतावणी करून हा गोसावी किल्ल्याच्या आत तर घुसलाच. तात्या नारोळकराला स्वामीची खुणेची चिठी दिली. त्याने ती प्रतापसिंहाकडे नेऊन दाखवली. खात्री पटताच महाराजानी आपली चिट्टी नारोळकराजवळ दिली नि त्याने ती रंगोबा गोसाव्याच्या झोळीत टाकली. काम झाले!
काम कसले झाले? किल्ल्यातून चिठ्ठीसह निसटण्याचे कर्म महाकठीण होते. चिठ्ठी उघडकीला आली का सगळ्या कटबाजांच्या माना तर लटकणारच फासावर. पण बिचाऱ्या प्रतापसिंहाचीहि धडगत उरायची नाही. रंगोबाने एका बाजूला जाऊन आपल्या पायाची पोटरी चिरली. त्यात छत्रपतीची चिठ्ठी लपवून वर चुना, झाडपाल्याचा चेचलेला पेण्ड बांधून, कुतरे चावल्याचा बहाणा करीत लंगडत लंगडत आमचा गोसावी परत जाण्यासाठी दरवाज्यावर आला. पहातो तो काय! नुकतेच शहरातून वर परत आलेले किल्लेदार काशीपंत बंदरे समोर दरवाजावरच उभे! गोसाव्याला पहाताच स्वारी उखडली. केव्हा आला? कोणी आत सोडला?
वगैरे चौकशीच्या डरकाळ्या फोडू लागली. शिष्यागाळीची सरबत्ति झडू लागली. फितुरीच्या संशयावरून काशीपंताने चिंचेच्या फोका आणवून गोसाव्याला सडकून काढला. पण तो कसलाच काही थांगपत्ता लागू देईना. "मी गरीब रामदासी गोसावी. देवी मंगळाईच्या दर्शनाला आलो होतो." या पलिकडे एक शब्दहि तो सांगे ना. कचेरीत गेल्यावर काशीपंताने पुन्हा कारकून पाठवून आणखी एकदा कस्सून झाडा घेतला. काही सापडले नाही. दोन दिवस अन्नपाण्याशिवाय चौकीवर अटकेत ठेवण्याचा हुकूम दिला.
मित्रांच्या तोंडचे पाणी पळाले
किल्ल्यावर काशीपंताने एका गोसाव्याला पकडून चोप दिला नि अटकेत ठेवला आहे. ही बातमी सगळीकडे फैलावली. रंगोबा सापडला म्हणून जैतापुराला स्वामी चिटणीस विठ्ठलपंत रंगोपंतदादा कपाळाला हात लाऊन बसले. दोन दिवस ना स्नान ना अन्न स्वामीनी तर देव पाण्यात घालून समर्थाना सांकडे घातले. रंगोवा फुटला का सगळ्यांचीच कपाळे फुटणार, असा भयंकर प्रसंग होता. यांत स्वामीकंपू तर सापडणारच, पण त्यांच्यावर उपकार करायला गेलेल्या तात्या नारोळकरादि असामीनाहि प्रायश्चित घेण्याची ती पाळी होती. अर्थात सगळा कटच उघडकीला आल्यावर छत्रपतीच्या संभाव्य अवहेलनेची कल्पनाच केलेली बरी.
जय जय रघुवीर समर्थ
दोन दिवस अन्नपाण्याशिवाय तळमळत ठेऊनहि हा गोसावडा काही कबूल करीत नाही, तेव्हा काशीपंताने गरीब बेडा भिकारी समजून त्याला किल्ल्याबाहेर हाकून दिले. रंगोबा त्याच पावली उपाशीतापाशी तडक माहुलीहून जरंड्याच्या डोंगराकडून जैतापुराला गेला. पायाला जखम, रक्त वहातच आहे, चालवत नाही, तशात दोन दिवसांचा उपाशी, अशा अवस्थेत चिटणिसांच्या घराच्या अंगणात तो आला आणि मोठ्याने जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना केली. स्वामी वगैरे मंडळी बाहेर येऊन पहातात तो- रंगोबा गोसावी! स्वामीनी धावत जाऊन मिठी मारली नि उत्कंठेने विचारले, ‘रंगोबा क्षेम आहे ना?’ त्याने निश्चयदर्शक होकाराची मान हालवतांच स्वामीनी मोठ्या ललकारीने-
समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे
जयाची लिला वर्णिती लोक तीनी
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
हा श्लोक गर्जून म्हटला. चिटणिसादि मंडळी धाऊन आली. सर्व घडली हकिकत रंगोबाने सांगितली. "स्वामीनी मला पोटासी धरून नेत्रातून पाणी आंगावर टाकिले. फार श्रमी सर्वत्र जाहले. आणि बोलिले की आज कासीपंतानी चिंचेच्या फोका व बेडी वगैरे जरब देणे ती दिल्ही. परंतु तू कोणाचे नाव न घेता सर्वांचा बचाव केलास व माहाराजाची हातची चिठी पायाचे मनगटास बांधून आणली. ही गोष्ट श्रीनी मोठी केली. बरे, माहाराजाचे पायास तू मळ लाविला नाहीस. मोठे संकटातून पार पाडलेस, नाहीपेक्षा प्राण चिटणिसानी व आम्ही व ज्याची नावे कळती त्याणी देणे आला होता. विठलपंतबाबा इत्यादि तू आज वाचविलेस. ये वेळेस बक्षिस तुला काय द्यावे बोलिले.’’
सचिवपंताने गिळलेले माझे वतन मला परत मिळाले का तेचे बक्षिस, असे रंगोबा म्हणताच. ‘‘श्रीस्वामीनी श्रीरामाची पूजा करते वेळी शफत वाहून तुळसी देवावरील दिल्या आणि सांगितले की हे वचन आज माहाराजानीच दिल्हे असे समज. हे वतन माहाराज चालवितील तुझे वतन हरप्रयत्न घेऊन देऊ बोलले व चिटणीसाकडून व बाबाकडूनहि वचन रंगोपंतदादांचे साक्षीने देविले.’’
रंगोबा चिठ्ठी घेऊन पुण्याला..
‘चिठ्ठी फक्त साहेबाला दाखव, बाळाजीपंत नातूला तिचा मागमूसहि लागू देऊ नकोस.’ अशी सूचना देऊन स्वामीनी रंगोबाला अलपिष्टनाच्या भेटीसाठी पुण्याला रवाना केले. तो तडक गारपिरावर गेला. तेथे त्याच्या ओळखीचा एक चपराशी भेटला. त्याच्यामार्फत ‘मी आलो आहे. भेट पाहिजे, काम नाजूक आहे. नातू गेल्यावर भेटीला बोलवावे.’ असा साहेबाला आंत निरोप धाडला. त्याने लगेच रंगोबाला आत बोलावले नि इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर, `आमची खान्याची वेळ झाली, तुम्ही आता जा. या कारकुनाला बसू द्या येथेच.’ असे नातूला सांगून त्याला घालविले.
`बोला आता,` अशी अलपिष्टनाने प्रस्तावना करताच, रंगोबाने पायाची पट्टी सोडून छत्रपतीच्या स्वदस्तुरची चिठ्ठी बाहेर काढून साहेबाला दिली नि पडली हकिकत सारी सांगितली. रंगोबाच्या धाडसाने अलपिष्टन चकितच झाला. त्याने त्याची वहावा केली. पाठ थोपटली. एका पुस्तकात रंगोबाचे नाव गाव पत्ता व इतर हकिकत त्रोटक लिहून घेतली आणि त्याला पांच मोहरा इनाम दिल्या. (मोठी मंडळी असली बक्षिसे नेहमी योग्य माणसाला देत असतात. तशात रंगो बापूजीने स्वामीकार्यासाठी घेतलेले श्रम आणि धाडस केव्हाहि कोणी कौतुक करण्यासारखेच होते. अलपिष्टनाने पांच मोहरा देऊन रंगोबाला शाबासकी दिली. यात नवलाला जागाच कोठे आहे? तसे काही त्याने केले नसते तरच आपण म्हटले असते का लेकाचा शुद्ध कोरडा पाषाण खरा! या पांच मोहराच्या मुद्यावर ठाणे येथील एक मयत संशोधक भावे यानी आपल्या एका मराठी दप्तर रुमालात ‘रंगो बापूजीने पांच मोहरा घेऊन स्वराज्याची भाड खाल्ली,’ अशा अर्थाचे चित्पावनी गरळ ओकले आहे. या को. ब्रा. भटांचा पिण्डच मुळी असा का त्याना आपल्या जातीशिवाय इतरांचे गुण घेण्याचा धर्मच माहीत नाही. चित्पावनेतरांच्या खोडसाळ निंदेनेच ते आपल्या जातभाईंचा इतिहास रंगवण्याचे कर्म करीत असतात. रंगोबाने अलपिष्टनाच्या पांच मोहरा घेऊन स्वराज्यविक्रीची बोहाणी केली. आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या पटवर्धनादि चित्पावन संस्थानिकानी पेशवाई हयात असतानाच कुंफणीच्या पंखाखाली जाऊन कसल्या कर्माचे दिवे लावले?)
नंतर ‘मी आपल्याला भेटलो, चिठ्ठी दिली, याची लेखी पोच द्यावी.’ असे रंगोबाने म्हटल्यावरून अलपिष्टनाने चिठ्ठी लिहून दिली कीं सर्व वृत्तांत समजला. आमची खात्री झाली आहे. त्याने रंगोबाला सूचना दिली की चिठ्ठीचा मजकूर नातूला सांगू नये. त्यावर रंगोबा म्हणाला की साहेबाने काळजी करूं नये. स्वामी कोण, त्यांची हकिकत काय. वगैरे गोष्टी साहेबाने मला विचारल्या. ते छत्रपतींचे गुरु असे सांगताच, टोपी काढून स्वामीना सलाम दिला, हीच थाप भी नातूला देतो. नंतर साहेबाने चिटणिसादि मंडळीना आमचा सलाम सांगावा असे बोलून रंगोबाला निरोप दिला. रंगोबाने मागितली म्हणून छत्रपतीची चिठ्ठीहि त्याने परत केली.
परतताना शिरवळास झाडझडती
साहेबाने दिलेली चिट्टी तेलात भिजवून युतीने बनवलेल्या लाखेच्या पोकळ गोळीत ती ठेवली आणि वर चांगला चुना लेपून चुनाबी बुडाशी लपवून ठेवली. नंतर रंगोबा बाळाजीपंत नातूला भेटला. त्याने त्याला एका बाजूला नेऊन, साहेबाशी काय काय राजकारण केले, त्याची खोदखोदून चौकशी केली. काशीपंत बंदन्याच्या विचेच्या फोकाला जो रंगोबा बधला नाही तो काय नातूला दाद देतो? नातूनेहि त्याला एक चिठी दिली आणि तो सातान्याकडे परत फिरला. वाटेत शिरवळच्या नदीवर येणान्या जाणान्यांची कसून झडती घेण्याचे काम शिपायी करीत होते. नातूची चिठी. बटव्यात होती. ती चटकन काढून तंबाखू खाल्ल्याच्या बहाण्याने रंगोबाने पटकन तोंडात टाकली नि गिळून फस्त केली. नंतर झडति दिली नि सुटला. आंगावरचे सारे कपडे फेकून देऊन, भिकान्याचे सोंग घेतले नि मार्ग चालू लागला. श्रीमहादेवाकडून चाफळास आल्यावर स्वामी प्रभृतींच्या भेटी होऊन, छत्रपतीची चिठ्ठी, साहेबानी दिलेली चिठ्ठी नि पांच मोहरा त्यांच्या हवाली केल्या.
मसलतदाराना छत्रपतींच्या सूचना
चाफळाहून स्वामीकंपू सातारला येऊन, ठरलेल्या व्यक्तीच्या तोंडून घडल्या सगळ्या हकिकतीचे वृत्त थेट प्रतापसिंह नि मातोश्री माईसाहेब यांना गुप्तपणाने कळविण्यात आले. त्यांचा परत निरोप आला की ‘‘चिटणीस वगैरे पुरातन सरकार पदरचे, या समई सेवा करून दाखवावी. परंतु आपला बचाव करून करणे ते करावे. स्वामीसहि विनति करावी की श्रीची प्रार्थना करावी. हाली आम्हापासी राजकारण प्रकर्णी काही कागद साधनी वगैरे होते. ते कांगद आम्हास आदेशा येऊन, सारे खोलीत एकीकडे बसून, जाळून पाणी करून टाकिले, अशी अडचण आहे. तरी जपून अंगावर न येता सावधगिरीने करणे ते करावे. तूर्त तुम्हास पुरा आश्रयहि तेथे कोणाचा नाही (परंतु) ही मसलत सेवटास न्यावी. सर्व दौलत स्वामीचीच (रामदासांच्या गादीची आहे.) ते जे करतील ते आमचे कल्याणाचेच करतील हा भरसा मला आहे.’’
मातोश्री माईसाहेब नि प्रतापसिंह यांचा हा निरोप आल्यामुळे, स्वामीना दीडबोट मांस चढले. छत्रपतीसाठी हव्या त्या धाडसात उडी घ्यायला रंगोबाहि फुरफुरू लागला. तेव्हा स्वामीनी त्याला इषारा दिला - "बातमी फार नाजूक. जिवावरील आहे. बहुत तजविजेने रहावे. लाहान माणसाची संगत असल्यास करू नये, कारण माणूस स्नेह्यापासी बोलते, त्यात ही गोष्ट निघाली म्हणजे घात होईल."
स्वामी-चिटणीस कंपूच्या वतीने चिटणिसाच्या नि रंगोबाच्या पुण्याला येरझारा चालू आहेत. तेव्हा कसले तरी राजकारण शिजत आहे. असा बिनचूक कयास काशीपंताने बांधला आणि किल्ल्याचा बंदोबस्त कड़वा राखून वर आणि खाली शहरात पटाईत हेराच्या टोळ्या जागोजाग पेरून ठेवल्या. तिकडे पुण्याचेहि वातावरण बरेच बिघडत चालले होते. सातारा ते पुणे फितुरांचा सुळसुळाट उडाला होता. सातारा किल्ल्यावरचे राजकारण पुण्यास गारपिरापर्यन्त भिडल्याची शंका रावबाजीला येऊ लागली होती.
बाळाजीपंत नातूकडून या विषयी काही सुगावा घेण्याचा त्याने पुष्कळ यत्न केला. पण त्याने कानावर हात ठेवले, बळवंत मल्हार चिटणिसाने अलपिष्टनाला जी बखर लिहून दिली होती. तिचा इंग्रेजी तरजुमा करण्याचे आणि वास्तव अवास्तव तपासण्याचे काम नातूकडे होते. एके रात्री चिटणीस ज्या वाड्यात उतरत असत, तेथे नातू नि चिटणीस कागदपत्र पहात बसले असता. २५ शिपायी बरोबर घेऊन त्रिंबकजीने वाड्याला वेढा घातला. मुद्देमालासह दोघानाहि पकडून श्रीमंतापुढे उभे करावे, असा हा डाव होता. पण गराड्याची चाहूल लागताच. गडबडीने कागद गुंडाळून, वाड्याच्या मागील परसाच्या भिंताडावरून उडी मारून चिटणीस नातू पसार झाले. यावरून आपले राजकारण रावबाजीला कळले. एवढी अटकळ स्वामीकंपूने बाधली.
पेशवे आंग्रेज हातघाईवर
गंगाधर शास्त्र्यांच्या खुनापासून पेशवे नि आंग्रेज यांची दोस्ती बरीच चिघळू लागली होती. १३ जून १८१७ च्या तहाने तर रावबाजीचे मऱ्हाठशाहीतले सारे वजन नष्ट होऊन तो एक लहानसा संस्थानीक बनला. हररोज रावबाजीच्या नि अलपिष्टनाच्या प्रत्यक्षाप्रत्यक्ष कलागति चालू झाल्या. छत्रपतीच्या राजकारणाचा सोक्षमोक्ष साधायची हीस संधि, असा विचार करून रंगोबा पुण्यास अलपिष्टनला भेटला. "बाजीरावचा नि आमचा नुकताच तह झाला आहे. त्यात त्याने जर बिघाड केला, तर महाराजाशी दोस्ती पुरी करायची किंवा कसे ते सांगता येईल." असा अलपिष्टनाने खुलासा केला.
रंगोबा- साहेब, इतक्या दिवसाचा तुमचेवर टाकलेला भरंसा एका शब्दात तुम्ही वाऱ्यावर उडऊन दिलात! या निसरड्या बोलण्याने आमचा बचाव कसा होणार? पेशव्यांच्या अटकेतून छत्रपती महाराजांची मुक्तता करून, त्यांच्या दौलतीचा बंदोबस्त आपण कराल. या आशेवर एवढे राजकारण आम्ही केले. पेशवे तर लागले वाटेला.
अलपिष्टन- तुम्ही निराश होऊ नका. बाजीराव तहाला धुडकावण्याच्या कारवाया करीत आहे. आमची सक्त नजर आहे. किंचित त्याने अटकळ केली पुरे का आम्ही पाहून घेतो. तुम्ही धीर धरावा. योग्य वेळी सब कुछ ठीक होजायगा. महाराज सबका धणी है.
रंगोबा साताऱ्यास परत येऊन झाला मजकूर किल्ल्यावर महाराजाना कळविण्यात आला. पण उलट निरोप काहीच आला नाही. सारी मंडळी पुण्याकडच्या हालचालीकडे लक्ष लावून बसली.
प्रकरण ३ रे
राज्यक्रांतीच्या शेवटल्या घटका
रावबाजीचे आसन डळमळू लागले आणि तो भराभर आंग्रेजी जाळ्यात असकत चालला, तेव्हा स्वराज्याचे काय होणार या विवंचनेनेच छत्रपतीनी किल्ल्याबाहेरच्या आपल्या निष्ठावंत मंडळीतर्फे आंग्रेजाकडे मसलतीचे संधान बांधले, हे आपण मागील प्रकरणात पाहिले. सन १८१७ साल उजाडताच आंग्रेजांचा जोर वाढला. १३ जून १८१७ च्या तहामुळे, आपल्याच हाताने आपल्या सत्तेखाली आपण सुरूंग लाऊन घेतला, या स्पष्ट जाणिवेने रावबाजी अस्वस्थ झाला.
आपले सारे सरदार सरंजामदार इनामदार जहागिरदार आपल्या अमदानीला कंटाळून, स्वताच्या साधनासाठी, अंग्रेजांच्या संधानी लागले. इतकेच नव्हे तर खुद्द छत्रपतींचीहि आंग्रेजांकडे राजकारणे चालू झाली. तेव्हा आता उरले तरी काय? लोकसंग्रहाचा पाठिंबा गेला. खुद धन्यालाहि बेमुर्वतीने वागवल्यामुळे त्याच्याहि भरंशाला आपण मुकलो. आता पेशवाई म्हणजे असपिष्टनाच्या सुरकाऱ्याचा लहरी खेळ आहे!
छत्रपतीना कसेहि करून आपल्या बाजूला प्रसन्न करून घेतले तर त्यांच्या नावासाठी नि मुर्वतीसाठी तरी बिथरलेली सरदार मंडळी एकवटून आपल्याला आंग्रेजांशी अखेरचा निर्वाणीचा मुकाबला देता येईल, असा बेत ठरवून, अधिक श्रावण मासाच्या धार्मिक निमित्ताने रावबाजी माहुलीला तीर्थस्नानास गेला. महाराजांकडे मोठ्या आदमीचा निरोप पाठवून, त्याना सपरिवार माहुलीला येण्याचे निमंत्रण दिले. प्रतापसिंह, त्याचे दोन धाकटे भाऊ नि मातोश्री आनंदीबाई याना मोठ्या थाटामाटाने ज्याजतगाजत माहुलीला आणले.
स्वता अनवाणी पुढे जाऊन महाराजांचे स्वागत केले. तीर्थस्नानांचा बादशाही थाट केला. मेजवान्यांची झोड उडऊन देऊन, महाराजांचे नि परिवाराचे मन अगदी निहायत खूष करून टाकले. सातान्याचे कारभारी नि किल्ल्यावरचे नोकर लोकच पाजी नि हरामखोर, पेशवा फार सज्जन, निर्मळ मनाचा, आदबदार असा देखावा रावबाजीने निर्माण केला. प्रतापसिंह नि माईसाहेब अगदी प्रसन्न असल्याची संधि पाहून, रावबाजीने त्यांच्या जवळ राजकारणाची भाषा काढली.
"इंग्रेजांशी तह केला. चूक झाली ती. रयतेला त्रास होत आहे. बंडाळी फार माजली. बारीकसारीक इनामदारसुद्धा अग्रेजाशी संगनमत होऊन दौलतीशी फटकून वागत आहेत. अंग्रेज स्थाना आंतून फूस देत आहेत. माझे काहीहि होवो, पण महाराजाची दौलत राखण्यासाठी, अंग्रेजांचा काटा काढलाच पाहिजे. महाराजांचे बाबतीत आतापावेतो माझे वर्तन दोषी असेच झाले. सेवकाचे अपराध खावदानी मायपोट करून क्षमाये. आंग्रेजांची खोडकी मोडल्यावर, सारा कारभार महाराजावर सोपवून, त्यांच्या आज्ञेबाहेर वागायचे नाही. अशी मी शपथ घेतो.’’
डोक्याचे पागोटे काढून रावबाजीने प्रतापसिंहाच्या पायावर ठेवले आणि तो आसवे ढाळू लागला. पोटात शिरून मतलब साधण्याच्या कामी रावबाजीसारखा नट त्याचा तोच. प्रतापसिंह, विशेषतः त्याची आई आनंदीबाई त्याला पुरी ओळखून होती. त्यानी हो ला हो ठोकून वेळ मारून नेली. आंग्रेजी संधानाबाबत महाराज काही तरी बोलतील, असा रावबाजीचा अंदाज होता. पण तो फोल ठरला, मायलेकरानी कसलाच काही थांग त्याला लागू दिला नाही,
महाराज आपल्या जाळ्यात आले. अशा कल्पनेने, ‘आंग्रेजांशी लढाई आम्ही पुकारणार, तेव्हा महाराजानी सुरक्षिततेसाठी वासोटा किल्ल्यावर जाऊन रहावे आणि आमचा निरोप येतांच आम्हाला छावणीत येऊन मिळावे,’ असे सांगून, रावबाजी गेला. पेशव्याच्या या मानभावी मनधरणीची आईसाहेबानी आपल्या खास विश्वासातल्या मंडळीशी वाटाघाट करून ‘सध्या स्वस्थ बसावे, अंग्रेजांकडील मसलत चालूच ठेवावी, वेळ प्रसंग पडेल तसे आयत्या वेळी वागावे,’ असा निर्णय घेतला.
लढावे का न लढावे?
पुण्यास जाऊन रावबाजी सैन्याची जमवाजमव करू लागला. एकट्या बापू गोखल्याशिवाय इतर कोणीहि सरदार अंग्रेजांशी लढाईचा प्रसंग आणायचा सल्ला देई ना. लढावे का न लढावे, असा रावबाजीपुढे हॅमलेटी प्रश्न पडला. अतिप्रसंग येण्यापूर्वी साहेबाला बनवता येईल की काय हे पहाण्यासाठी ता. १४ ऑक्टोबर १८१७ मंगळवारी रावबाजी अलपिष्टनच्या भेटीला गेला. ही त्याची शेवटचीच भेट ठरली.
‘‘साहेब, तुमचे आमचे ऐक्यतेस किती संवत्सरे झाली?` आगम निगम भूत भविष्य पाहून तुम्हाशी ऐक्यता केली. ते समई करार मदार, कितेक कामाच्या तजविजी करून रूपास आणावे त्याचा जिम्मा तुम्ही सर्व प्रकारे करता, आजतागाईत काय झाले याचे स्मरण करावे. इतके तुम्ही करीत असता तुमचे मानस मी कदापि तोडले नाही. येणेकरून ऐश्वर्य अथवा जो पदार्थ माझे अंगी होता तो तेजोहीन झाला. मी मूळ मंत्रावेगळा तुमचे करण्यानी झालो. जो मी होतो तो आज नाही. तुम्ही कशास पुसता? तुमचे स्नेहाची जोड मात्र केली कीं जी कला अंगी होती ती दवडून बसलो.’’
असे रावबाजी पुष्कळ बोलला. साहेबाने सारे हसण्यावारीच नेले. आज विसाव्या शतकाच्या पाचव्या दशकातहि आम्हाला आंग्रेज प्राण्याच्या अंतःकरणाचा नीटसा ठावठिकाणा उमगत नाही, तर तो बिचाऱ्या रावबाजीला काय किंवा प्रतापसिंहाला काय लागला नाही, म्हणून त्याना दोष देण्यात काय अर्थ?
ठिणगी पडली आग भडकली
१८१७चा नवंबर महिना पेशव्याच्या कुंडलीत फार खराब असावा. पेशवा आणि अंग्रेज दोघेहि, प्रथम अटकळ कोण करतो, याची वाट पहात असतानाच, २ नवंबर रविवारी, ले. शॉ नावाचा एक आंग्रेज अधिकारी गणेशखिंडीकडून जात असता, विश्रामसिंग नावाच्या पेशव्याच्या नाईकाची नि त्याची बोलाचाली होऊन, विश्रामसिगाने त्याला माला मारून जखमी केले.
ही आगळीक होताच, अंग्रेजानी उठाव केला. ५ तारखेला खडकीची १५ तारखेला घोरपडीची लढाई होऊन १७ तारखेला सोमवारी आंग्रेजांच्या पलटणी पुणे शहरात घुसल्या आणि बाळाजीपंत नातूने शनवार वाड्यावरचा मन्हाठ्यांचा भगवा झेण्डा दूर भिरकावून आंग्रेजांचा युनियन जॅक बावटा फडकवण्याची कामगिरी बजावली. पुणे पडले. पेशवा पसार झाला. तमाम महाराष्ट्रात हाहाकार उडाला. पेशवा पुढे पळतो आहे. आंग्रेज गब्रू त्याच्या पाठलागावर धावताहेत. मधून मधून दोघांच्या सैन्याच्या चकमकी झडताहेत, असा क्रम १८१८च्या फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत चालला.
पुणे पडले-पुढे काय?
या सर्व भानगडी होत असताना छत्रपतिनिष्ठांचा कंपू स्वस्थ बसला नव्हता. सातारा किल्ल्यावरून माहुलीला जातानाच प्रतापसिंहाने, किल्ल्याबाहेरील आपल्या खटपट्यांशी प्रत्यक्ष संबंध जोडण्याचा यत्न केला. महाराज किल्ल्यातून बाहेर पडताना, एकाकी त्यांच्या बोटातली हिऱ्याची आंगठी कोठेतरी गळून पडल्याची अफवा फैलावली. पेशवा माहुलीहून जाताच. चाफळच्या स्वामीलाहि महाराजानी भेटायला आणण्याची तरतूद केली होती. पण ते जमले नाही.
इकडे रंगो बापूजी नि चिटणीस यांच्या पुण्याला खेपा चालू असतानाच, विठ्ठलपंत (विठ्ठल बल्लाळ महाजनी फडणीस), दाजीबा उपाध्ये नि तात्या नारोळकर यांच्या सल्ल्यानुसार, नरसू कांकडे जामदार या छत्रपतीच्या खास. दिमतीतल्या इमानी इसमाला रंगोबाने भिजत घातलेल्या राजकारणाचा ठाव पहाण्यासाठी प्रतापसिंहाने, अलपिष्टन आणि थेट मुंबईच्या गव्हर्नरकडे पाठविले. दोघानीहि काकडे याजबरोबर निरोप पाठविला की "तुम्ही आपल्या राज्याविषयी फिकीर करू नये, याच दिवसांत आपल्या मनोदयानुरूप आपला बंदोबस्त होईल. असे महाराजास सांगावे",
माहुलीस महाराजांचा निरोप घेताना, रावबाजीने आपल्या कारभाऱ्याना महाराजांची सपरिवार वासोटा किल्ल्यावर रवानगी करण्याचे हुकूम दिले होते. इतकेच नव्हे तर, यदाकदाचित आंग्रेजानी एकाकी वासोट्याला वेढा देऊन छत्रपतींची सुटका करण्याचा घाट घातला तर मागेपुढे न पहाता, छत्रपतींची परिवारासह एकदम कत्तल करावी, असेहि गुप्त हुकूम सोडले होते.
खडकीच्या लढाईची (५-११-१८५७) बातमी येताच, कारभाऱ्यानी छत्रपतींना त्यांच्या खुषी नाखुषीची पर्वा न करता. सातारा किल्ल्यावरून काढले आणि ९ नवंबर रविवारी त्याना सपरिवार वासोटा किल्ल्यावर आणून कडक बंदोबस्तात ठेवले. आंग्रेजाशी चाललेल्या छत्रपतीच्या संधानाची कुणकुण रावबाजीला लागल्यामुळे हवा तो भीमप्रयत्न करून छत्रपति त्यांच्या हाती जाऊ द्यायचा नाही, हा रावबाजीचा यत्न आणि आपली तर पेशव्याच्या कचाटातून सुटका व्हावी, हा छत्रपतीचा नि त्याच्या बाजूच्या मंडळींचा यत्न, अशी ही चुरशीची शर्यतच चालू झाली.
घोरपडीच्या लढाईच्या दिवशी रंगोबापूजी पुण्यातच होता. त्याने अष्टिनाची गाठ घेऊन महाराजाना वासोट्याला आणून ठेवल्याची खबर दिली. साहेब म्हणाला. ‘‘थोड्याच दिवसात आमची पलटणे माहुलीला येतील, तेव्हा योग्य दिसेल तो बंदोबस्त करू.’’ रंगोबा परत साताऱ्याला येतो, तो निंबाच्या पाराजवळच चिटणीस गडबडीने पुण्याला जाताना भेटले, त्यांच्याजवळ छत्रपतीची हिऱ्याची आंगठी (माहुलीला जाताना हरवलेली आंगठी ती हीच चिटणिसाला गुप्तपणाने ती देण्यासाठी प्रतापसिंहाने नरसू काकडयाच्या हवाली ती करून हरपल्याचा बोभाटा केल्याचे दिसते.) खुणेसाठी बरोबर घेतलेली होती आणि रावबाजीने प्रसंग पडल्यास छत्रपतीची कत्तल करण्याचे हुकमाची कुणकुण ते अलपिष्टनाच्या कानावर घालून पुढे काय करणार, याचा नक्की ठराव करायला जलदीने जात असल्याचे रंगोबाला समजले. पाठोपाठ नरसू काकडेहि वेषांतर करून पुण्याला जाताना भेटला.
अलपिष्टनाने दोघांच्याहि बातम्या ऐकून घेतल्या. ‘‘वासोट्यावर आमचा हल्ला गेला नाही, तर पेशवा छत्रपतीना आपल्या सैन्यात घेऊन जाणार आहे. ठीक आहे. आम्ही वासोट्याच्या वाटेला जातच नाही. बाजीरावाची नि आमची कोठेतरी लढाई होईलच. तेव्हा महाराजानी अक्कलहुशारीने पेशव्याच्या छावणीतून आमच्या सैन्यात येऊन मिळावे.’’ अशी अलपिष्टनाने तरकीब सुचवून चिटणिसाला प्रतापसिंहाच्या अगदी नजीक रहाण्याची सूचना देऊन परत जायला सांगितले आणि हा निरोप गुप्तपणाने महाराजाना कळवून त्यांची तयारी करण्याची मसलत तडीला नेण्यासाठी नरसू काकड्याला पाठोपाठ परत पाठविले.
छत्रपतीची फरफटणी
पुणे सर केल्यानंतर आंग्रेजी फौजा पेशव्याच्या मागे लागल्या आहेत, ठिकठिकाणी त्याच्या सरदारांच्या नि आंग्रेजांच्या खडाजंगीच्या चकमकी झडत आहेत. बापू गोखल्यासारखे काही वीर आंग्रेजाशी ठासून तोंड देण्याची शिकस्त करीत आहेत. पण खुद पेशवाच धड एक्या जागी नेटाने उभा न रहाता वाट फुटेल तिकडे धूम जीव घेऊन पळत सुटला आहे. अशा अवस्थेत मऱ्हाठी सैन्याचा आंग्रेजांपुढे टिकाव लागे ना. २ दिसेम्बर १८१७ ला रावबाजीने छत्रपतीला पत्र लिहून छावणीत दाखल होण्याची विनंती केली.
१४ दिसेम्बर रोजी प्रतापसिंह, दोघे भाऊ नि आईसाहेब आपल्या परिवारासह गारदांडाजवळ सिद्धटेक येथे पेशव्याच्या लष्करात दाखल झाले. (अथवा `दाखल केले. असेच म्हणणे सार्थ होईल.) या दिवसापासून तो २० फेब्रुवारी १८१८ ला गोपाळ आष्टीची लढाई होईपर्यंत पेशव्याच्या बेसुमार पळणीबरोबर त्या बिचाऱ्यांची एकसारखी फरफटणी चालूच होती. याच धावपळीत ‘पंधरा दिवसांच्या आत तुम्हाला साताऱ्यास पोचवतो’ असा अलपिष्टनाचा नरसू काकडयामार्फत महाराजाना निरोप आला.
बापू गोखल्याचा पराक्रम
१९ फेब्रुवारीला रायबाजी गोपाळ आष्टीच्या मुक्कामावर असताना, जनरल स्मिथने पेशव्याच्या छावणीवर चाल केली. बापू गोखले धावत आले. रावबाजी जेवायला बसला होता. ठासून ‘‘श्रीमंत, इंग्रज जवळ आले आहेत. आता आपण पळू नये. आमच्या मागे जरा उभे रहाल. तर तरवारीची शर्थ करून त्याना पुरे पडतो.’’ असे सांगितले, भोजनप्रिय रावबाजी गोखल्याच्या अंगावर खेकसून म्हणाले- "आजवर तुम्ही लढाईची मसलत दिलीत आणि आता आम्हाला सुखाने जेऊनसुद्धा देत नाही. असेच आमचे संरक्षण करणार की काय?" बापूने तडाड जबाब दिला- ‘‘श्रीमंत, आपला हुकूम असो वा नसो, मी आज आता लढाई देणार’’ असे बोलून गोखले झपाट्याने निघून गेले. खरे पाहिले तर, ‘‘सरदार मंडळी चित्त शुद्ध नव्हते.
कोणीहि सरकार कामास झटत नव्हता, आणि श्रीमंत आपल्या एकट्यालाच दोष देतात. यामुळे संताप येऊन मी रणमुख होणार, मागे काय पाहिजे ते होवो, आज रण सिद्धच आहे.’’ सेवकजनांवर स्वामीचे चित्त असे विटल्यावर रणांगणी स्वामी कार्यावर आल्याने बहुमानच आहे. याउपरी चरणदर्शन होईल तर उत्तम. नाहीपेक्षा हेच शेवटचे असे बोलून नमस्कार करून इंग्रजाचे सन्मुख जाऊन उभे राहिले.... लष्करात गलबल झाली. घाबरेपणे बाजीराव भोजन टाकून डेऱ्याबाहेर आले. लष्करात आरडा चालला. मेणा जलद आणवून बसून चालीस लागले. महाराजांस चलावे म्हणून सांगून पाठविले. इंग्रजांशी मुकाबला होताच बापू गोखल्यानी चालून घेतले. पन्नास आसामीनिशी हत्यार चालविले. घेरा पडला. मागून कुमक पोचली नाही. बाजीराव निघून जाताच फौज पळून गेली. गोखल्याने इरेस पडून खुर, स्मिथसाहेबावर तरवार केली. तीन चार गोरे मारले. आडवे बाजूनी स्मिथसाहेबानी पिस्तोल मारिला.
जोडगोळ्या लागल्या. तत्रापि संभाळून ज. स्मिथवर हात टाकला. बोलले, बापू गोखले म्हणतात तो मी. उजवे मानेवर जखम केली. जनरेलानी बापूचे डोईवर हात चालविला. डोईची कपरी फुटून घोड्याखाली आले. प्राण (पेशव्यानी वाघ्याचे पागे बनवलेल्या यध्यायत चित्पावन सरदारांत धन्यासाठी नि रियासतीसाठी समरांगणावर वीरोचित प्राणार्पण करणारा फक्त एकटा बापू गोखला! बाकीच्या संधिसाधूची आज संस्थाने आहेत. गोखल्यांचे वंशज साधेसुधे नागरीक.) सोडला.
मरेना का तो छत्रपति.
बापू गोखले जिवाची तमा न बाळगता अवघ्या ५० अनुयायांसह लढतो आहे, पण त्याला कुमक न पाठवता, रावबाजी मेण्यात बसून समरांगणावरून धूम ठोकीत पळत सुटला. छत्रपतीनाहि पळा पळा, घोडी दपटा, म्हणून सारखा निरोपावर निरोप धाडू लागला. अखेर त्याने आपला एक तैखदार घोडा पाठवून, त्यावर बसून झपाट्याने मागोमाग या, असा निरोप पाठवला. प्रतापसिंह चिडला. तो म्हणाला - "पूर्वी आम्ही घोड़ी मागितली, तेव्हा दुष्काळ पडला होता. आता कशाला? आहे त्याच घोड्यावर बसून, येववेल तसे येतच आहो."
शामराव व बाळाराव रास्ते छत्रपतींच्या कबिल्यामागे राहून, चला चला. लवकर चला, असा अट्टहास करीत होते. प्रतापसिंहाने राघोपत जोशाला विचारले, कोणरे हे? त्याने सांगितले, श्रीमंताकडचे रास्ते. प्रतापसिंह - ‘‘आस्सं. इतक्या दिवस आमच्यामागे चालायला कोणा नव्हते. आजच कोठून आले?’’ रास्ते विरमले धावत रावबाजीकडे गेले नि झाला प्रकार सांगितला. पेशव्याने सखू खैरा हुजन्याला पाठवले नि विनंती कळविली की "स्वामीची यासमई मजवर मर्जी प्रसन्न असावी. दोन कोश सांभाळून गेल्यावर मी विनंत्या करून सर्व स्वामीचे पुढे ठेवतो."
नंतर लढाईची एकच रणधुमाळी माजली. रावबाजी पळू लागला त्याच्या पाठीवर अंग्रेजांच्या काही पलटणी लागल्या. बाकीच्या छत्रपति होते तिकडे वळल्या. पिस्तोल गोळ्या सणासण येऊ लागल्या. पण सैन्यातला एकहि मायचा पूत म्यानातून तरवार काडीना, जो तो सुखरूप पळायचा रस्ता शोधू लागला आणि पळता पळता गोळीबाराने पटापट उलथून पडू लागला. आंग्रेजी पलटणांची लगट चेपीत छत्रपतींच्या समोर येऊ लागली.
संगीना उन्हानी चमकू लागल्या. महाराजाभोवती असलेले सैन्य केवळ भाडोत्री ते आपल्या रावबाजी धन्याप्रमाणे यः पलायते स जीवति करण्याच्या तंत्रात तडफडणारे. ही अवस्था रावबाजीला कळवण्यासाठी, राघोबा जोशी, गडबडीने पुढे सरणार तोच समोरून बंदुकांची फेर झडली नि तडाड एक मुर्दा त्याच्या पुढेच येऊन कोसळला. राघोबा परतला नि म्हणाला. "सरकार, गोऱ्या काळ्या पलटणीचा वेढा पक्का पडला. आता पळण्यात शहाणपणा नाही." तेव्हा प्रतापसिंहाने म्यानातून तरवार उपसली.
भाऊसाहेब आप्पासाहेबानीहि तरवारी उपसल्या नि हल्ल्याला तोंड देण्यासाठी ठाण मांडून घोडे आवरून उभे राहिले. हां हां म्हणता कंपनीची एक पलटण नीट रोखाने आगावर चालून आलीच. बंदुकीच्या गोळ्यांचा मुसळधार पाऊस कोसळू लागला, प्रसंग पाहून बळवंतराव मल्हार चिटणिसाने घोड्यावरून उडी मारून तो पायउतारा झाला आणि धिटाईने हात वर करून नीट पलटणीच्या तोंडावर धावत ओरडत गेला. "सबूर सबूर, गोली मत चलाव. सतरिके महाराज छत्रपति सरकार यहां खडे है. गोली मत चलाव,’’ चिटणिसाच्या या समयोचित धाडसाने छत्रपतीवरील मोठाच संकटाचा प्रसंग सावरला गेला.
पलटणीचा मेजर दपटिन (Doveton) पुढे आला. पलटणीचे देशी अंमलदार सेख बडेबावा जमादार नि सेख मकबुल हेहि पुढे आले. त्यानी चौकशी केली. गोळीबार बंद करण्याचा इषारा (सिग्नल) दिला. सेख बड़ेबावाने अंगाभोवती तलवारीचे हात गरगर फिरवून जागा मोकळी केली. घेरा मात्र कायम ठेवला. दपटिन नि कर्नल प्रिंग्ले टेलर चिटणिसाबरोबर छत्रपति आपल्या परिवारासह उभे होते, तेथे गेले. छत्रपति सभोवार बाळासाहेब भोसले सेनापति (चतुरसिंगाचे पुत्र) नरहरराय नि यशवंतराव चिटणीस बंधू पोडेस्वार होऊन तलवारी सरसाऊन उभे होते.
दपटिनने तलवारी टाकण्याचा हुकूम केला. छत्रपतींच्या हुकुमाशिवाय आम्ही कोणाचा हुकूम जुमानणार नाही, असे सडतोड उत्तर बाळासाहेबाने दिले. चिटणीसाने छत्रपति कोण ते दाखविले, दपटिनने नि टेलरने टोप्या काढून मुजरा केला. दोघानी पुढे होऊन प्रतापसिंहाशी शेखॅण्ड केले आणि तरवारी देण्याची सूचना केली. आपल्या सैन्याने हत्यारे खाली ठेवली आहेत. आपणहि ठेवावे. प्रतापसिंह चिडला. "निशस्त्र होण्यापेक्षा तुमच्याशी दोन हात करून या समरांगणावर मेलेले काय वाईट? असा अपमान मी सहन करणार नाही."
(प्रतापसिंहाच्या या वेळच्या आविर्भावाचे कर्नल प्रिंग्ले टेलर याने पुढे २० वर्षानी (म्हणजे महाराजावर कंपनी सरकारने बालटे आणल्यावर) किती मार्मिक नि यथार्थ वर्णन केले. ते पहा. ‘‘Before me was a youth, with calm brow and resolved mind, submitting to be cut down by the men of the 22nd Dragoons, in preference to the dishonor of relinquishing his sword. When I saved him I felt that such a spirit could never descend to any of the meanness and follies with which he has since been charged.’’ (भावार्थ) माझ्या समोर निश्चळ भुवयांनी आपल्या धीरगंभीर वृत्तीचा निश्चय व्यक्त करणारा एक तरुण उभा होता. आपल्या हातातली तलवार टाकण्याचा अपमान सहन करण्यापेक्षा, बेहत्तर आहे. आमच्या २२ व्या ड्रॅगून पलटणीशी दोन हात करून शरिराचे तुकडे तुकडे झालेले काय वाईट, असा त्याचा निर्धार मला स्पष्ट दिसत होता. आज त्याच महाराजावर जी घाणेरडी शुभां रचण्यात आली आहेत, तितका मनाचा नीचपणा किंवा मूर्खपणा त्याच्या हातून होणेच शक्य नाही, असे त्याला वाचवताना माझा जो ग्रह झाला. तो अद्यापि कायम आहे.)
तेव्हा बळवंतरावने समजूत घातली की आंग्रजांशी ठरलेल्या मसलतीप्रमाणे दोस्तीची खूण म्हणून मेजर साहेब तरवार मागत आहेत. तेव्हा प्रतापसिंहाने तरवार दपटिनच्या हातात दिली. त्याने पुन्हा सलाम करून, महाराजांचा भगवा झेण्डा उभारण्याचा हुकूम दिला आणि ‘छत्रपति प्रतापसिंह महाराजकी जय` ललकाऱ्यात सर्वांनी त्याला प्रणाम केले.
साहेबानी सगळ्याना घोडेस्वार व्हायला सांगितले. माईसाहेबाना आग्रहाने हत्तीवर अंबारीत बसविले. प्रतापसिंहाचा हात धरून दपटिन कंपनीच्या छावणीकडे घेऊन चालला, भगवा झेण्डा पुढे आणि मागाहून ही मंडळी इंग्रजी बैण्डवादनात चालू झाली. जनरल स्मिथ बापू गोखल्याच्या तडाक्याने जखमी होऊन एका मेण्यात विवळत पडला होता. त्याला बातमी लागताच तो मेण्याबाहेर येऊन महाराजाना सामोरा गेला. नजरानजर होताच. त्याने टोपी काढून आदबीने सलाम केला नि बोलला. "आता सगळे राज्य नि सिंहासन महाराजांचेच, यात शंकाच नको.’’
अष्टीच्या तळावर एक कोटी रुपयांचा विषय आंग्रेजाना सापडला. छत्रपतीबरोबर सामान वगैरे काहीच नव्हते, तेव्हा लुटीतील सामानाचे सतरा उंट महाराजाकडे देऊन मेरे उभारले. रहाण्याची विसाव्याची व्यवस्था झाली. सर्वांनी साखरपाणी घेतले.
इतक्यात दोन डोल्या आल्या. एकींत गोखल्याकडील अंताजीपंत हजीरनीस जखमी होते आणि दुसरीत बापू गोखले यांचे प्रेत होते. नरहर मल्हार चिटणिसाने ओळखले. `फक्त आंगरखा मलमलीचा आंगात उरला होता. घोड्यानी तुडविले त्याणी पायाचे कातडे गेले होते. दोन जखमा होत्या.’ प्रतापसिंहाने शिबिराबाहेर येऊन बापूना दोन हात जोडून नमस्कार केला. सगळ्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. चार घटिका रात्री नदीच्या काठी आबाजीपंत यांच्या हस्ते अग्निसंस्कार करविला. राघोपंत जोशी नि पांडोबा हे दोन रावबाजीचे आश्रित तेथे होते. पण त्यानी या संस्कारकर्मात भाग घेण्याचे नाकारले. रावबाजीचे आश्रित खरे!
ही भानगड आटोपल्यावर जनरल स्मिथ नि बिलिमोर साहेब प्रतापसिंहाच्या शिबिरात आले. आता पुढे काय मर्जी आहे. विचारले, छत्रपति म्हणाले - "अलपिष्टनाची भेट व्हायची, तो तुमचीच अगोदर झाली. हरकत नाही. त्यांचे आमचे राजकारण आधीच ठरलेले आहे. येथे सगळी पळापळ झाली. आमचेहि घोडे तिखट होते. सहज आम्हीहि निसटुन गेलो असतो. गेले दोन महिने आमची निष्कारण फरफटणी चाललीच आहे. पण पूर्व संकेत समजून लगामा खेचून उभे राहिलो. आता अलपिष्टनाची नि आमची मेट घालून द्यावी म्हणजे झाले."
प्रकरण ४ थे
आंग्लाई पेचाची पहिली सरगांठ
सध्या प्रतापसिंहाला आंग्रेजांच्या छावणीत विसाव्यासाठी तसेच सोडून, आपल्याला थोडे मागे जाऊन, अलपिष्टनाच्या हालचालीचा आढावा घेतला पाहिजे. म्हणजे पुढे घडणाऱ्या अनेक घटनांचा अर्थ नीट ध्यानात येईल.
रावबाजीने आंग्रेजावर हत्यार उपसल्याची बातमी कलकत्याला जाताच, गवर्नर जनरलने "पेशव्यांचे सगळे राज्य खालसा करावे.’’ असा अलपिष्टनाला हुकूम सोडला. त्याची ‘चीफ कमिशनर ऑफ दि डेक्कन’ म्हणून कुलमुखत्यारीच्या हुद्यावर नेमणूक केली. ‘आपला हा हुकूम महाराष्ट्रात ताबडतोब जाहीर करा.’ हा गू. ज.चा हुकूम मात्र त्याने गुप्तच ठेवला. अमलात आणला नाही. त्याला कारणेहि तशीच महत्त्वाची होती.
असला अरेरावी हुकूम जाहीर होता, तर अकदम सारा मऱ्हाठा चोहीकडून अंग्रेजाना खायला खवळून उठला असता आणि दक्खनमध्ये नुकती कोठे मूळ घरीत असलेली आंग्रेजांची राजकारणी लुडबूड वादळातल्या पाचोळ्यासारखी तेव्हाच उधळून गेली असती. छत्रपतीविषयी आंग्लाई सहानुभूतीचे बुजगावणे पुढे करून पेशव्याविषयी तमाम मऱ्हाठ्यांच्या मनात तिटकारा निर्माण करायचा आणि रयतेला गोडगोड साखरपेरणीच्या लांबरुंद आशीर्वादांनी आपल्या भजनी लावायचे, हे काम महत्त्वाचे, तसेच चतुरायीचेहि होते. अलपिष्टनाने ते साधण्याकडे आपल्या शक्तियुक्तीला कशी एकवटली, हे पाहिले पाहिजे.
सातारा किल्ला जिंकण्याचा फार्स!
छत्रपतीला खाकोटीला मारून पेशवा रायबाजी धूम हवा तसा, हवेसारखा बेफाट पळतो आहे आणि आंग्रेजांचे लष्कर त्याच्यामागे धावत आहे. या ३-४ महिन्यांच्या धावपळीने कुंफणीचे लष्कर नि सेनापति अगदी मेटाकुटीला आले होते. ता. १० फेब्रुवारी १८१८ रोजी "फिरंगी याचा मुकाम कोरेगावाहून मंगलवारी प्रहर दिवसास सातारियास दाखल जाहाला. नंतर त्याच वेलेस नाकेबंदी शहरची करून, लोकास अभय देऊन, किल्यावर चिठी लिहिली की कुंपीणबहादर याचा हुकूम किला खाली करून देणे. त्याचे उत्तर आले की, श्रीमंतांची परवानगी पाहिजे.
त्याजवर साहेब (कर्नल बॉल आणि जनरल स्मिथ) रागे भरून लष्करात जाऊन च्यार तोफा आणून कुलपी गोले वीसपर्यन्त सोडले. इतक्यात किल्यावरील कारकून बोलणार आला. रुमाल फिरऊन तोफ बंद केली. वरला बंदुखीसुधा बार देखिल जाहाला नाही. बोलणे होऊन वर निरोप सांगून खाली निरोप सांगावयास यावे, इतक्यात दोन तीनसे पलटणचे लोक दरवाज्यास गेले. प्रहर रात्री वरील लोक खाली उतरून आले. कासीपत याची बायका व आई मात्र खाली उतरू दिल्ही चीजवस्त सकाली उतरून देऊ. आसा करार केल्यानंतर सकाली बंदी केली. वरले माणूस वर, खाले खाली, आसे केले. काल दोन प्रहरी निशाण आपले बड़े लाविले, आणि लस्करच्या तोफा दीस केल्या आणि ते निशाण उतरून भगवे निशाण लाविले." (पेशवे दप्तर नं. ४१ पत्र नं. १८७)
तोफा सोडून किल्ला सर करायचा, त्यावर आंग्रेजांचा युनियन जॅक बावटा चढवायचा आणि नंतर पांच दहा मिनिटांच्या आतच तो उतरून मऱ्हाठ्यांचा भगवा झेण्डा फडकवायचा, या फार्सात मोठा आंग्लाई अर्थ होता. पूर्व संकेताप्रमाणे छत्रपति आज ना उद्या आमच्या ताब्यात येणारच, त्याना सातारला आणणे आम्हाला क्रमप्राप्तच तेव्हा सातारा शहर नि किल्ला प्रथम आम्ही जिंकून नंतर तुमच्या ताब्यात (मेहरबानी म्हणून) दिला, अशी संभावीत कायदेबाजी या फार्साने तयार करून ठेवली.
अलपिष्टनाचा पहिला जाहीरनामा
इकडे १० फेब्रुवारीला साताऱ्याचा किल्ला जिंकण्याचा फार्स होतो, तोंच तिकडे पुण्याहून ता. ११ फेब्रूवारीला लगेच दुसऱ्या दिवशी अलपिष्टन एक लांबलचक जाहीरनामा महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून फैलावतो. त्यात "बाजीराव पेशव्याच्या कैदेत असलेल्या सातारच्या महाराजाना आम्ही मुक्त करणार आहो आणि त्याना नि त्यांच्या कुटुंबियाना सुखाने, मानमरातबाने नि वैभवाने रहाता येईल. एवढ्या मोठ्या विस्ताराचे स्वतंत्र राज्य करून देणार आहो.
याच उद्देशाने सातारचा किल्ला आम्ही सर केला आणि त्यावर महाराजांचा भगवा झेण्डा उभारला आहे. तसेच महाराजांच्या माजी दिवाणाना कामावर हजर होण्यास कळविले आहे." हा मजकूर घातला जातो. हे आश्चर्यच नव्हे काय? त्या काळी आताप्रमाणे तारायंत्र, टेलिफोन, रेडिओ वगैरे झटपट बातमीची साधने थोडीच होती? पण पहा. मंगळवारी दोन प्रहरी सातारा किल्ल्यावर बावट्यांची चढ उतरणी होते आणि बुधवारच्या पुण्याच्या जाहिरनाम्यात त्याची ठळक नोंद होते!
आंग्रेजांची राजकारणे पहिल्यापासूनच कशी घड्याळाच्या यंत्रासारखी चालत असत, हेच यावरून दिसून येते. आंग्रेजांचे सेनापति सातारचा किल्ला घेतात काय, त्यावर आपले निशाण लावतात काय आणि लगेच दोनचार मिनिटांत ते उतरून छत्रपतींचा भगवा झेण्डा चढवून त्याला तोफांची सलामी देतात काय! त्या वेळच्या भोळ्या मऱ्हाठी रयतेला वाटले का आहाहा. आंग्रेज आपले खरे कैवारी आहेत. मोठे निरीच्छ आहेत. त्याना स्वार्थ कसा तो ठावाच नाही. पहा कसे आमच्या छत्रपति धन्यासाठी ते झटताहेत. नाहीतर लेकाचा तो द्वाड ग्रामण पेशवा!
धन्याला धत्तुरा दाखवून चोर आपणच मलिदा खात होता! धन्य आंग्रेजबहादुर! अलपिष्टनाच्या जाहिरनाम्यात रावबाजीच्या दुष्ट बुद्धीचे नि नालायकीचे भरपूर पुरावे देऊन, अंग्रेज महाशयांचे उद्देश रसाळ वाणीने स्पष्ट सांगण्यात आले, `देशात सुव्यवस्था नांदावी, लोकांना न्याय मिळावा, त्यांच्या शेतवाडी बतनादिकांचे संरक्षण व्हावे, या पेक्षा आमचा दुसरा कोणताहि हेतू नाही.’ रात्रंदिवस हल्ले, लूटमार, दरोडे आणि लढाया याना कंटाळून गेलेल्या लोकाना, या आश्वासनाने दीडबोट मासच चढले.
`दोन महिन्यांच्या आत पेशव्याचा पक्ष सोडून जे स्वस्थ बसतील, त्यांची वतने, जहागिऱ्या वगैरे पूर्वीप्रमाणेच बिनधोक पुढे चालविण्यात येतील.’ खुषीने या नाखुषीने पेशव्याच्या हाकेला हाक आपण दिली नाही तर तो आपला सूड घेईल, ही लोकांच्या मनातली भीति या जाहिरनाम्याने नाहीशी होऊन, ते घरोघर स्वस्थ बसले. रावबाजीबरोबर भटकणारे हजारो शिपायी नि बारगीर भराभर पळू लागले. अनेक ब्राम्हण सरदारानीहि तेच केले.
धार्मिक बाबतीत हात घालणार नाही
रावबाजीच्या कारभारात ब्राम्हण संतर्पणाशिवाय दुसरे कसलेच राजकारण नसल्यामुळे, दीर्घ धोरणी अलपिष्टनाने भटाबामणाना खूप करून गप्प बसविण्यासाठी. ‘लोकांच्या धार्मिक बाबती आहेत तशाच पुढे निर्वेध चालविण्यात येतील, त्यात कुंफणी सरकार लेषमात्र ढवळाढवळ करणार नाही,’ असा ठळक खुलासा जाहीरनाम्यात केल्यामुळे, भोजनभाऊ भटांचा जीव तांब्यात पडला.
ते म्हणू लागले, ‘मरे ना का तो राण्डलेक पेशवा! आपल्या पुडी दक्षिणेची व्यवस्था ठाकठीक पुढे चालली म्हणजे झाले. राज्य कोणी का महार करीना! आपल्याला काय त्याचे?’ धर्ममार्तण्ड भिक्षुक भटांची मनाची ही ठेवण लक्षात ठेवण्यासारखी आहे. स्वार्थापुढे त्याना केव्हाहि कशाचीहि पर्वा नसते. ही मक्खी ओळखून अष्टधाची लढाई संपताच भटाबामणांचा संतोष राखण्यासाठी अलपिष्टन मुद्दाम स्वता बाईला गेला. बाई म्हणजे भटाबामणांची दक्षिणेतली काशी.
अझूनहि अर्कट भटांचे नमुने वाईला पहाण्यात येतात. अलपिष्टनाने दवंडी पिटवून सान्या क्षेत्रस्थ भूदेवांची जंगी जाहीरसभा बोलावली. जाहीरनामा स्वता मराठीत बाचून त्यातले सारे मुद्दे नि कलमे खुलासेवार समजाऊन दिली. विद्वान भटाना शालजोडया नि बक्षिसे वाटली. सहस्त्र भोजनाचा थाट उडवला. सगळ्या भूदेवानी घसा फोडून कुंफणी सरकारचा नि ‘अलफिसान’ साहेबाचा जयजयकार केला. कुंफणीच्या कारभाराला वेदोक्त आशीर्वाद देऊन यश चिंतिले. हाच प्रयोग पुण्याला करून, अलपिष्टनाने तेथल्या भटानाहि आपल्या भजनी लावले. छंगीफंगी पेशव्याचे राज्य जाऊन, शांतिप्रिय न्यायप्रिय आंग्रेजांचे राज्य होवो, असा जो तो बोलू लागला.
बामणं मथवली- बामणेतर गठवले
बाई पुण्याची भटें भोजनाच्या खमंग वासाने कबजांत आली. पण बामणेतर मराठ्यादि अफाट जनसमूहाचे काय? ते जातिवंत लढवय्ये, सदानकदा मुलुखगिरीचे शोकीन मनाचे मानी नि तलवारीचे अभिमानी. ते काय भटासारखे लाडू झोडून आंग्रेजाना भाळणारे थोडेच होते? पण आंग्रेजी हिकमतीने त्यानाहि गठवले. ‘पेशव्याने अपहार केलेले मऱ्हाठ्यांचे राज्य. दौलतीचे खरे धणी छत्रपती महाराज यांच्या हवाली करून, त्याना साताऱ्याला आम्ही स्थापन करणार’ या जाहीर वचनाने अलपिष्टनाने यच्चावत बामणेतरादि मराठ्याना खूष करून नाचायलाच लावले.
कुंफणी सरकार म्हणजे अवतारी देवता नि अलपिष्टनादि तिचे भगतगण म्हणजे देवदूत, ही भावना महाराष्ट्रात सर्रास फैलावली. आंग्रेजांना यश येऊन त्यांचे राज्य लवकर प्रस्थापित व्हावे म्हणून बाई पुण्याच्या कित्येक भटानी मोठमोठे यज्ञ केले. तात्पर्य, अलपिष्टनाचा ११ फेब्रुवारीचा जाहिरनामा म्हणजे आंग्लाई राजकारणाची पहिली धोरणी ‘ग्यानबाची मेख’ असे मानण्यात येते. या मेखेच्या तडाक्याने रावबाजी तडाक्यासरसा सगळीकडे उघडा पडला.
स्मिथच्या छावणीत प्रतापसिंह
अलपिष्टनाची नि आमची मुलाखत घडवून आणा, असे सांगतानाच, प्रतापसिंहाने स्मिथला बजावले. "तुमच्या साहेबाशी शपथेवर ठरलेल्या राजकारणाप्रमाणे, आम्ही तुम्हाला येऊन तर सामील झालो. बाजीराव मोठा धूर्त नि लाघवी आहे. हजार मसलति लढवून तो तुमच्याशी तहाला तयार होईल आणि आम्हा सर्वांना ताब्यात देण्याची मागणी करील, तर मग तुम्ही काय कराल? पूर्वी आम्हाला दिलेल्या आश्वासनांवर बोळा फिरवाल?" त्यावर स्मिथने गंभीरपणाने उत्तर दिले. "महाराज, आम्ही आपल्याला शपथपूर्वक आश्वासन देतो का आमचे प्राण जाईपर्यंत तरी हुजूर सरकारला बाजीरावाच्या ताब्यात आम्ही जाऊ देणार नाही.
आपण आम्हाला सामील झाला आहात. बाजीराव आता आम्हाला कोण? तो आता एक बंडवाला झाला. सगळी मऱ्हाठी रियासत आता महाराजांचीच आहे. आम्ही कोणत्याहि सबबीवर बाजीरावाशी तह करणार नाही. तह करायचाच तरं तो महाराजांशी." नंतर घडलेली हकिकत अलपिष्टनाला कळविण्यासाठी, स्मिथचे टपाल रवाना होणार होते. त्यात प्रतापसिंहाच्या सांगण्याप्रमाणे बळवंतराव चिटणीसाने बाळाजीपंत नातूच्या नावाने अलपिष्टानाला पत्र लिहून आम्ही येऊन सामील झालो, आता तुम्ही तुमच्या वचनाला जागा, अशी विनंती कळविली.
‘`पेशव्याला हाकलून देऊन, आंग्रेजानी छत्रपतीना स्वराज्याचे धनि केले.`’ असा गवंगवा स्मिथ प्रभृती मंडळीनी गावोगाव फैलावताच, खेड्यापाड्यातून नजराणे घेऊन लोक प्रतापसिंहाच्या भेटीला येऊ लागले. तेव्हा बिलिमोर महाराजासमोर येऊन म्हणाला, "पाहिलंत सरकार आता आपण खरोखरच आपल्या विशाल मऱ्हाठी रियासतीचे स्वामी झालात."
शिलंगणाच्या थाटात पुण्याकडे प्रयाण
ता. २१ फेब्रूवारी १८१८ शनिवारी सपरिवार छत्रपतीना घेऊन स्मिथ पुण्याच्या रोखाने अलपिष्टनाला भेटायला निघाला. दसन्याच्या शिलंगणाला असतो तशा थाटाने स्वारी चालविली. आघाडीला निशाणाचा शृंगारलेला हत्ती, त्याच्या मागे उंटावरल्या नौबदी, घोड्यावरच्या रण-नौबदी बैलगाडयावरून रणढोल चौघडा, शिंगे कर्णे वगैरे देशी वाद्ये, आणि या सगळ्यांच्या मागे आंग्रेजी लष्कराचा बॅण्ड, नंतर आघाडीचे स्वार, मागे हत्तीच्या अंबाऱ्यातून छत्रपति, त्यांचे दोघे भाऊ, माईसाहेब, इतर परिवार घोड्यावर, अशा डामडौलाने स्वारी चालत असता, गावोगावचे रयत लोक छत्रपतीचे दर्शन घेऊन त्याना आरत्या ओवाळीत होते. लोक जमले म्हणजे स्मिथ नि दपटिन त्याना सांगत की ‘देखो, आब डौलटके मालिक चट्रापाटी म्हाराज है, बाजीराव अभि भाग गया. वो अभि बंडवाला डुश्मन है.’ गावोगावच्या लोकाना असे भासविण्यात आले का हे गोरे हापसर छत्रपतींचे नोकर आहेत.
हिंगणगावाला जरिपटक्याचा समारंभ
हिंगणगावच्या मुकामाला स्मिथने जरिपटका उभारण्याचा मोठा समारंभ केला. दोन प्रहरी पटांगणात झेण्ड्याच्या काठीभोवती तमाम खेडवळ लोकांची गर्दी झाली. स्मिथच्या दिमतीचे कॅपटन टोकही कप मेन मि. बिलिमोर, कॅप हार्डकॅसल नि शॉ मेजर डव्हटन (दपटिन) आणि विसाजी रामाजी, छत्रपति नि त्यांच्या परिवारासह, आदबीने उभे राहिले.
बळवंतराव मल्हार चिटणिसाने छत्रपतीना कुर्निसात करून, दोरी ओढून जरिपटका वर खेचताच, साहेब लोकानी टोप्या काढून आणि इतरानी मऱ्हाठशाही थाटाचे झेण्डाला मुजरे केले. तोफांची सरबत झडली. आता छत्रपति मऱ्हाठी साम्राज्याचे मालक झाले आहेत. वगैरे ठरावीक व्याख्यान स्मिथने दिल्यावर हा समारंभ आटोपला. पुण्याला जाताना गावोगाव असले जाहीर समारंभ करून, कुंफणीच्या अंमलदारानी आपण सारे छत्रपतीसाठी नि रयतेसाठी एकनिष्ठेने झटत आहोत, असा लोकांत प्रचंड विश्वास निर्माण केला.
समारंभ आटोपल्यावर सारे जण डेऱ्यात गेले. तेथे स्मिथने प्रतापसिंहाशी भाषण केले. तो इंग्रजीत बोलत होता आणि बिलिमोर हिंदुस्थानीत तर्जुमा सांगत होता. भाषणाचा सारांश - ‘‘एलफिन्स्टन साहेबांचे बहोत खुषीचे पत्र आले आहे. बड्या लाटाकडे (मार्क्वीस ऑफ हेस्टिंग्ज) कलकत्त्याला त्यानी पत्र पाठविले आहे. लवकरच एलफिन्स्टन स्वता महाराजाना भेटायला येताहेत. महाराज आता मऱ्हाठेशाहीचे मालक झाले आहेत. हे साम्राज्य (एम्पायर) त्यांचेच आहे. यापुढे महाराजानाच जातीने त्याचा कारभार पहायचा आहे. आम्ही बाजीरावाला कायमचे हद्दपार करणार आहोत. आता महाराजानी मन मानेल तेव्हा साताऱ्यास जाये नि गादीवर बसावे. राज्यकारभाराची सूत्रे हातात घ्यावी. बाजीरावाचा नि आमचा कधिकाळी समेट होईल, अशी भीति मुळीच बाळगू नये... एक नाजूक गोष्ट केली पाहिजे.
सध्या महाराजांच्या मुदपाकखान्यात राघोबा जोशी नि पांडोबा नावाचे दोन आचारी आहेत. ते आहेत बाजीरावाचे पक्षपाती. त्याना ताबडतोब महाराजानी हाकलून द्यावे. इकडच्या बित्तंबातम्या ते तिकडे कळविण्याचा संभव आहे. फार काय पण त्यांच्यामुळे महाराजांच्या जिवालाहि एकादे वेळी धोका येण्याचा संभव आहे.’’ नंतर पान अत्तर वगैरे झाल्यावर स्मिथ मंडळी वाकून मुजरे करून निघून गेली.
खाशा खाशांची पहिली भेट
मजल दरमजल करीत पुण्याच्या रोखाने छत्रपतींची छावणी ४ मार्च १८१८ बुधवारी बेलसर येथे पोचली, तोच नरसू काकड्याबरोबर बाळाजीपंत नातूचा महाराजाना निरोप आला की ‘अलपिष्टन साहेब आज भेटायला येत आहेत. आपण साहेबावर पुरा पुरा भरसा राखावा आणि ते विचारतील त्या सर्व प्रश्नाना त्याना आनंद वाटेल अशीच उत्तरे द्यावी.’ महाराजानी बळवंतराव मल्हार चिटणिसाला सामोरा पाठविले. लष्करी लवाजम्यानिशी अलपिष्टन येत होता. बरोबर मि. रसेल, जन. स्मिथ, मि. बिलिमोर, कॅप, ग्रॅण्ट आणि बाळाजीपंत नातू होते. महाराजांच्या डेऱ्यात येताच सगळ्या साहेबलोकानी टोप्या काढून आदबीने वाकून महाराजाना सलाम केले. महाराजानी बसा म्हणून सांगितल्यावरच सारे खाली बसले.
तब्यत कशी काय आहे, वगैरे मामुली संभावित प्रश्नोत्तरे झाल्यावर अलपिष्टन म्हणाला- ‘‘महाराजांच्या केसालाहि धक्का न लागता, ते सपरिवार आमच्या छावणीत सुखरूप येऊ शकले. हे महाराजांचे नि आमचेहि मोठे भाग्य कलकत्त्याच्या बडे लाटसाहेबाना आम्ही लिहिलेच आहे. त्याना फारफार आनंद झाला असेल. मी लवकरच या रसेल साहेबाना महाराजांच्या सर्व बंदोबस्ताविषयी चर्चा करून हुकूम आणण्यासाठी कलकत्याला रवाना करणार आहे. महाराजाना काही संदेश अथवा एकादा माणूस बडेलाटाकडे धाडायचा असेल तर खुशाल धाडावा.’’
त्यावर प्रतापसिंहाने उत्तर केले- "आमच्या बंदोबस्ताविषयी सर्व तपशील आमचे चिटणिसानी साहेबाशी निश्चित ठरविलेलाच आहे आणि तो आता आपण नीतीला नि कायद्याला स्मरून पार पाडाल अशी मला आशा आहे. साहेबांवर माझा पूर्ण भरंसा आहे. तेवढ्यासाठी मी आप्तगणगोत सर्वस्वाचा त्याग करून आपल्याला येऊन सामील झालो." अलपिष्टन - ‘‘महाराजानी कशाचीहि चिंता करू नये. नरहरपंत चिटणिसाने महाराजांच्या प्रकरणाबाबत नुकताच माझ्याजवळ पुन्हा पाढा वाचलेला आहे. तो विचारात घेऊन आम्ही एक जाहीरनामा तयार केला आहे. त्याचा मसुदा आता बाळाजीपंत नातू वाचून दाखवितील.’’ नंतर नातूने तो मसुदा वाचून दाखविला. ठीक आहे म्हणून महाराज, बळवंतराव चिटणीस नि अलपिष्टन बोलले. बैठक आटोपली.
छत्रपतींची आंग्लाई सरबरायी
या भेटीनंतर अलपिष्टनाने मेजवान्या, नजराणे आणि स्वागताचे दरबार यांचा छत्रपतीवर नुसता पाऊस पाडला. चांदीची भांडी. बनातीच्या पालख्या आरसे लावलेल्या अंबाऱ्या, काय काय नि काय काय! हे साहेबलोक देवदूत का देव याचा छत्रपतिकंपूला उलगडाच होईना. सकाळ संध्याकाळ साहेब समाचाराला यायचे नि गोडगोड बोलून जायचे. बाळाजीपंत नातू तर काय, एकाद्या तात्यापंतोजीच्या ऐटीने असे करा नि तसे बोलू नका, असा महाराजाना पावलोपावली इषारे देत होता.
पुढे एके दिवशी नातूला घेऊन कॅपटन ग्रॅण्ट आला नि म्हणाला. ‘‘मेहरबान अलपिष्टन साहेब जरूरीच्या कामासाठी गेले. त्यानी मला नित्य आपल्याजवळ दिमतीला राहून, त्यांच्याशी नि आमच्या सरकाराशी महाराजाना जे काही बोलाचालायचे ते माझ्या मार्फत करावे, असे आपल्याला सांगितले आहे.’’ कॅप्टन ग्रॅण्ट मध्यस्त म्हणून येऊन बसला शेजारी, नंतर साताऱ्याला जाण्यासाठी छावणी मागे फिरली. ठिकठिकाणचे गडकोट किल्ले कुंफणीचे लष्कर काबीज करीत आहे नि त्यावर छत्रपतीचे निशाण उभारीत आहे. अशा क्रमाने स्वाऱ्या २२ मार्चला वासोट्याच्या किल्ल्याखाली येऊन दाखल झाल्या. मुकामाच्या ठिकाणी गॅण्टची नि महाराजांची रोज राजकारणी बोलणी चालू होती.
गॅण्ट- जागोजागचे हे सारे किल्ले आम्ही महाराजांच्या नावानेच काबीज करीत आहोत.
प्रतापसिंह- ते तर सारे आमचेच आहेत. काबीज ते काय करायचे?
ग्रॅण्ट- सध्या सगळीकडे बंडाळी चालू आहे. वतनदार जाहागिरदारांचे वाद चालू आहेत. तेव्हा सध्या हे किल्ले कंपनी सरकारच्या ताब्यात रहातील. निशाण मात्र महाराजांचेच फडकेल.
प्रताप- मग आमच्या ताब्यात काय काय देणार?
गॅण्ट- या बाबतीत अलपिष्टन साहेबांचा मनोदय असा आहे. नीरेअलीकडील भीमा नदीची हद्द व वारणेची हद्द, कृष्णा भीमेच्या संगमापर्यंतचा पश्चिम सह्याद्रीच्या पायथ्यापासूनचा मुलूख आपल्याला द्यावा, अशी बडेलाटाकडे त्यानी शिफारस लिहून पाठविली आहे.
प्रताप- म्हंजे? आपण काहीतरी चमत्कारीक सांगता है. साहेब! पेशव्याच्या अमलखालचा सगळा मुलूख कायद्याने आमचा. तो सलंग आम्हाला बिनशर्थ मिळण्याचा साहेबाशी ठराव झाला असता, आज हे असे बोलणे का?
ग्रॅण्ट- महाराजाना कोणत्याहि रीतीने नाखूष करण्याची आमची मुळीच इच्छा नाही. आपण हे सारे बडेलाटाना कळवून, त्यांचे हुकूम आणता येतील.
प्रताप- मग कराच तसे ताबडतोब रसेलसाहेबाला पत्र पाठवून हे प्रकरण बडेलाटांच्या नजरेपुढे ठेवण्याची लगबग करा.
आजच याच क्षणाला प्रतापसिंहांला चटका बसला की हे वरवर गोरेगोमटे दिसणारे गोडबोले आंग्लाई जंतरमंतर प्रथम वाटले तितके सरळ नि सोपे नाही. पण आता करतो काय? घडेल त्या मुकाबल्याला धैर्याने तोंड देऊनच कुशलतेने हा गुंता सोडवण्याचा त्याने निश्चय केला.
तेलिणीच्या वासोट्याने तेल गाळले
सन १८१० साली बापू गोखल्याना तब्बल आठ महिने बेजार करणाऱ्या ताई तेलिणीच्या पराक्रमाने, तेलिण `मारी सोटा बापू गोखल्या संभाळ कासोटा’ ही सुप्रसिद्ध आर्या चिरंजीव करणारा वासोटा किल्ला सहजासहजी कंपनीच्या लष्कराला हस्तगत करता येई ना. वासोट्यावर छत्रपति नि त्यांचे बंधू यांच्या बायका नि भाऊसाहेबांचा मुलगा बाबासाहेब राजे भोसले होता. किल्लेदारावर अर्थात ही फार मोठी नाजूक जबाबदारी होती. "किल्ला खाली करून द्या" या कंपनीच्या धमकीला त्याने वाटाण्याच्या अक्षता लाऊन धुडकावले आणि किल्ला लढवायचा बेत केला.
आतापर्यन्त सगळे किल्ले हाक मारताच हाती पडले. पण वासोटा प्रतिकाराला उभा ठाकला. या वेळी अलपिष्टन वाईला जाऊन तेथल्या भटाबामणाना भोजने बक्षिसे देण्यात गढला होता. ग्रॅण्ट त्याला भेटून आला आणि महाराजाना विचारले की "वासोटा पडत नाही. साहेबांचे म्हणणे तोफा डागाव्या. हुजूरचे म्हणणे काय आहे?"
प्रताप- साहेबांची मर्जी आहे तर डागा तोफा.
ग्रॅण्ट- पण किल्ल्यावर महाराजांचे कबिले आहेत.
प्रताप- बेहत्तर तुमच्या दोस्तीसाठी आम्ही आमच्या जिवाची नि अब्रूची पर्वा केली नाही. आमच्या कुटुंबातल्या मंडळीनीहि तसेच वागावे, खुशाल डागा तोफा. तुमच्या दोस्तीसाठी नि सार्वजनीक कल्याणासाठी कुटुंबाची हानी झाली तरी पत्करली.
खालून किल्ल्यावर तोफांचा भडिमार होऊ लागला. आत आगीचे डोंबाळे उठले. त्या आगीत छोटा राजपुत्र बाबासाहेब राजे भोसले भाजून मेला. तब्बल आठ दिवस किल्लेदाराने झुंज दिली. अखेर नाइलाज झाल्यावर आणि खाली लष्करात छत्रपति आहेत हे समजल्यावर, पांढरे निशाण फडकवून तो शरण आला आणि किल्ला हवाली केला. (६ एप्रिल १८१८) लगेच बळवंतराव चिटणीस किल्ल्यावर गेला आणि तेथले कबिले खाली घेऊन आला.
इतक्यात वाईहून अलपिष्टनहि आला. वासोट्याच्या विजयाबद्दल त्याने महाराजांचा जयजयकार केला. मेजवान्या दिल्या. महाराजाना नि त्यांच्या बरोबरच्या यच्चावत दरबाऱ्याना नि कुटुंबियाना मोलवान पोषाख नि जवाहीर वाटले. नंतर स्वारी साताऱ्याकडे वळली. वाटेने गावोगावची रयत छत्रपतीना मुजरे करायला दुर्तफा रस्त्याने जमत असे. नजर नजराणेहि चालत असत. अशा रीतीने चैत्र शु. ५ ता. १० एप्रिल १८१८ शुक्रवारी छत्रपतीची नि कंपनीच्या लष्कराची छावणी करंजे गांवच्या आंबराईत झाली.
या ठिकाणी आंग्रेजानी प्रतापसिंहाकडून एक जाहीरनामा प्रसिद्ध करविला तो असा - "बाजीराव रघुनाथ यानी आम्हाला कुटुंबसुद्धा नजरबंदीत ठेऊन, शेवटी प्राणांचाहि घात करावा, अशी योजना केली. हे त्यांचे कामगार यांजकडून समजण्यात आले. या तऱ्हेची अमर्यादा कोणतेहि प्रकारें करण्यात कमी केले नाही. हे वर्तमान कंपनी बाहादर यांचेकडे समजाविल्यावरून, त्यानी कै. महाराजाचे पूर्वापार हे राज्य याजवर नजर देऊन, बाजीरावाचे प्रतिबंधातून खुलासा करून, राज्याचे ठायीं सिंहासनारूढ करून समारंभ केला, यावरून बहुत संतोष होऊन या सरकारची दोस्ती झाली. जे त्यांचे दोस्त, ते इकडील दोस्त. त्यांचे दुष्मन ते इकडील दुष्मन, हे सर्वास महशूर व्हावे." या जाहीरनाम्याने छत्रपतीने पेशव्याला आपल्या नोकरीतून ‘डिसमिस’ केले. असा स्पष्टार्थ जाहीर झाला. (१०-४-१८१८).
प्रकरण ५ वे
सभोवारच्या छाया पडछाया
मातोश्री आनंदीबाई
प्रतापसिंहाची मातोश्री आनंदीबाई ऊर्फ माईसाहेब यांचा सातारी राजकारणात फार मोठा हात होता. जिजाबाई ताराबाईप्रमाणेच भोसल्यांच्या राजघराण्याला शोभणारी माईसाहेब कर्तबगार राजमाता होती. सातारा किल्ल्यावर पेशवाई बंदिवासात असताना आणि सभोवार नोकर चाकरांच्या रूपाने त्रिंबकजीचे हेर वावरत असताना, या करारी बाईने आपल्या राजपुत्राचे शिक्षण नि शीलवर्धनाचे कार्य अत्यंत गुप्तपणाने आणि शिताफीने पार पाडले. शिवाजी जसा हरएक बाबतीत जिजामातेच्या सल्ल्याशिवाय पाऊल पुढे टाकीत नसे, तसाच प्रतापसिंहहि माईसाहेबांच्या मसलतीशिवाय कोणत्याच गोष्टीला होकार नकार देत नसे. आतापर्यन्त आंग्रेजांशी केलेल्या राजकारणातहि माईसाहेबांचेच मार्गदर्शन त्याला होते.
‘‘फिफ्टीन इअर्स इन इण्डिया’’ (हिंदुस्थानात १५ वर्षे) नामक ग्रंथाचा एक गोरा प्रवाशी आपल्या त्या ग्रंथात लिहितो, "ही राजमाता मर्दाप्रमाणे घोड्यावर बसून फिरतीला बाहेर पडत असे, कसा का तुफान घोडा असे ना, ती त्याला तेव्हाच कह्यात आणून त्यावर सफाईत रपेट करीत असे. जात्या ती फार सौंदर्यवान होती आणि तलम भरजरी पोषाखात ते सौंदर्य विशेष खुलून दिसे. ती एकदोनच ठळक दागिने वापरीत असे आणि बुरखा न घेता उघडपणे बाहेर येऊन भेटीला येणाऱ्या हापसरांच्या मुलाखती घेत असे.
त्या वेळी तिचा बोलका नि प्रेमळ स्वभाव तेव्हाच सर्वांच्या पहाण्यात येई. शरिराचा बांधा मजबूत नि मध्यम असून तिचा वर्ण केतकी रंगावर गोरा होता. तिचे वय ४०-५० च्या दरम्यानचे असावे. हिंदु स्त्रियांच्या आगी स्वभावताच असणारा भित्रेपणा तिच्या आगी नव्हता. थोडक्यात सांगावयाचे तर. ही बाई मोठी बुद्धिवान आणि प्रसंगावधानी होती. राजा (प्रतापसिंह) काही तसा नसे. म्हणूनच राजकारणी मसलतीच्या वेळी कोणाला कोणत्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचे, हेसुद्धा तो तिला विचारून देत असे."
स्वभावाने माईसाहेब अत्यंत करारी नि मानी असल्यामुळे रावबाजीनी नेमलेल्या त्रिंबकजी डेंगळ्याच्या हरएक साध्या सुध्या बाबतींतल्या प्रतिबंधामुळे त्या इतक्या चिडलेल्या संतापलेल्या होत्या, का परकीय आंग्रेजांच्या ओंझळीने साधे माणुसकीचे मर्यादित पाणी पिणे बरे, पण नाव मोठे नि कर्म खोटे असले हरघडी सेवकांच्या तोंडाकडे पहाण्याचे बेगडी वैभवाचे जिणे नको, असे त्याना वाटल्यास टीकेला जागाच नाही या राजकुटुंबाला कसकसे अवमान नि अडचणी सोसाव्या लागत, याची दोन तीन ठळक उदाहरणे पहा. नव्या राजवाड्यातल्या माजघरात ठेकूण झाले. म्हणून वरच्या दिवाणखान्यातले तक्त नि जामदारखाना खाली आणून, आम्हाला दिवाणखाना वापरायला द्या, असे माईसाहेबानी बंदरे कारभाऱ्याला सांगितले, तर तो म्हणाला,
‘‘पुण्याला सदाशीव माणकेश्वर (पेशव्यांचे कारभारी) याना पत्र पाठवून खुलासा विचारतो, त्याशिवाय मला काही करता येणार नाही.’’ प्रतापसिंहाचे वडील (धाकटे) शाहू महाराज यांच्या वैशाख शुद्ध ९ च्या श्राद्धाला आकरा मराठे पितर आणि दहा मराठणी (सवाष्णी) जेवायला लागायच्या. त्या बायांची जातायेता कस्सून झडती घ्यायची, हा पडला डेंगळ्यांचा हुकूम या मुद्यावर अर्थात कलागति व्हायच्या नि माईसाहेब संतापायच्या, झाडा घ्यायचा का नाही, याचेहि हुकूम पुण्याहून काशीपंत भागवणार आणि तेहि श्राद्धाचा दिवस उगवल्यावर! तुम्हा आम्हाला सुद्धा असले प्रतिबंध संतापाने वेडे करतील, मग त्या मानी राजकुटुंबाला काय वाटत असेल, याची कल्पना केलेली बरी. माईसाहेबांची सासू (शाहू महाराजांची वृद्ध मातोश्री) शहरातल्या वाड्यात एकाकी भयंकर आजारी पडली. ‘‘पायास गुडघ्याखाली कला बहुत लागल्या आहेत. सिरागत वायूची भावना, वैद्य बोलतात. ज्वरहि आहे. काहिली बहुत.’’
किल्ल्यावर माईसाहेबाना बातमी समजताच त्यानी चौकशीला एक दासी पाठविली. म्हातारी म्हणाली, "माईला म्हणावे, मला येऊन भेटून जा." झाले. काशीपंत उद्गारले- ‘‘ते सारे खरे, पण पुण्याचा हुकूम आल्याशिवाय मी काय करू शकणार? जाऊ देता येणार नाही.’’ वाचकहो, या दोन तीन नमुन्यावरून, छत्रपतींची पेशवे महाशयाने कशी बडदास्त ठेवली होती, हे आलेना तुमच्या नीट ध्यानात? असल्या काचाला कंटाळून. कोणीहि मानी माणूस आंग्रेजांच्याच काय पण जंगली आस्वलाच्याहि गळ्यात सुटकेसाठी मिठी मारायला तयार होईल. चंद्रमौळी झोपडीतल्या कष्टाळू शेतकऱ्यालाहि त्याच्या लकतरी जीवनात जेवढी मोकळीक नि मुभा असते, तेवढीहि या राजकुटुंबाला पेशव्यानी ठेवली नव्हती. हा मुद्दा आत्मियतेने विचारात घेतला तर त्यानी आंग्रेजांकडे राजकारण करण्यात कसलीहि चूक केली नाही, हे कबूल करावे लागेल.
चित्पावन आयागो बाळाजीपंत नातू
माणुसकीला आरपार पारखा असलेल्या या इसमाचे त्रोटक चरित्र परिशिष्टात दिलेले आहे. येथे चालू राजकारणातल्या त्याच्या उलाढालीच आपल्याला पहावयाच्या आहेत. अलपिष्टनाचा शिरस्तेदार आणि संभावीत हेर म्हणून, छत्रपतीशी वागताना नातू एकीकडे मोठा लाघवीपणा तर दुसरीकडे साहेबाच्या पाठिंब्याचा मगरूर तोरा मिरवीत असे. पेशव्याला खाड्यात घातला नि छत्रपतीला खोड्यांत अटकावला. ही सारी कर्तबगारी माझीच असल्यामुळे, अलपिष्टन कोणत्याहि बाबतीत माझ्या शब्दांपलिकडे जाणार नाही. ही नातूची मनोमन खात्री होती.
म्हणून छत्रपतीपुढे तो नेहमी छाती वर काढून वागत असे. शिवाय छत्रपतीच्या आंग्रेजाशी झालेल्या मसलतीचे सूतोवाच नातूच्या मार्फतीनेच झालेले असल्यामुळे तेवढ्यापुरते तरी छत्रपतीवर आपले वजन आहे. असे त्याला वाटणे सहाजीक होते. परंतु प्रतापसिंह नि माईसाहेब अगदीच काही दुधखुळे नव्हते त्यांनी नातूच्या मनाचा नि हेतूचा पक्का ठाव घेऊन ठेवलेला होता. बेलसरला झालेल्या पहिल्या भेटीपासूनच नातू त्यांच्या मनातून पुरा उतरला होता. साहेबांच्या तर्फे तो बोलणार चालणार, तेव्हा वरचेवर त्याच्याकडून होणाऱ्या अतिप्रसंगाबद्दल चकार शब्द न काढता, हरघडी पडणाऱ्या घटना मिटल्या तोंडी विवेकाने अभ्यासीत मायलेक स्वस्थ असत.
खरे पाहिले तर थोरले शाहू महाराज वारल्यानंतर सातारचा सारा कारभार पुण्याला रवाना झाला. अर्थात चिटणीस फडणीस सेनापति वगैरे राजमंडळाचे पुरातन अधिकारी पागतंबाकू चघळीत घरोघर स्वस्थ बसले. वतनांचे उत्पन्न खाये नि स्वस्थ रहावे. पुढे रावबाजीने तर त्यांची वतनेहि बरीच खच्ची केली. आता प्रतापसिंहाला कुंफणी सरकार गादीवर बसवणार, आंग्रेजांच्या ताटाखालचे मांजर येवढीच या छत्रपतीची सत्तामत्ता असणार ही गौप्याची कुणकुण नातूला होतीच.
छत्रपतीची पद्धतशीर स्थापना होताच, राजमंडळहि अस्तित्वात येणार. तेव्हा छत्रपतीची दिवाणगिरी आपणाला द्यावी, असा नांतूने अलपिष्टनाकडे जोर लावला. जुना फडणीस विठ्ठल बल्लाळ महाजनी याने सरकारसेवा अखंड केलेली असल्यामुळे, तो दिवाणगिरीच्या जागेवर टक लाऊन बसला होता. विठ्ठलपंताने बळवंतराव चिटणिसामार्फत आपल्या हक्काचे लोण अलपिष्टनापर्यंत पोचविण्याची खटपट केली.
‘साहेबाजवळ माझा वशिला या चिटणिसाला साहेब काय धूप घालणार?’ या कल्पनेत नातू होता. पण अलपिष्टन नातूला पुरा ओळखून होता. हे नातूला उमगत नव्हते. कामापुरता हवा त्याला मामा बनवून स्वार्थ साधण्याची आंग्लाई हिकमत अलपिष्टनापासून आजदिन तागायत अखंड चालू आहे. अलपिष्टनाने विचार केला, बाळाजीपंत नातूसारख्या चित्पावनाला छत्रपतीचा पेशवा केले, तर काय बदल होणार? भट पेशवाईच्या मागोमाग नातू पेशवाई चालू होणार! चित्पावनी सत्ताबाजीला मराठ्यादि बामणेतर आणि यच्चावत चित्पावनेतर जसे विटले होते, तसे अलपिष्टनादि आंग्रेजही त्यांच्या कुटील नीतीला ओळखून होते. चित्पावन नातूपेक्षा कऱ्हाडा महाजनी दिवाण केलेला बरा. या उद्देशाने त्याने हे दिवाणगिरीचे प्रकरण प्रतापसिंहाकडे आपल्या शिफारशीसह निवाड्यासाठी पाठवून दिले. प्रतापसिंहाने विठ्ठलपंतालाच दिवाण करावे, असा निकाल दिला. नातू चरपडला. विठ्ठलपंताचे नि त्याचे कायमचे वैर आले. प्रतापसिंहाविषयीही नातूने सापासारखा मनात डूक धरला. आपण वाईटपणा घेण्यापेक्षा, परस्पर छत्रपतीच्या इच्छेला पुढे करून, अलपिष्टनाने पाहुण्याच्या हातून विंचू ठेवण्याचे काम उरकून घेतले.
अलपिष्टनाच्या ग्रँण्टला गुप्त सूचना
वासोटा जिंकून करंज्याच्या आंबराईत छत्रपतीची छावणी पडण्याच्या अवधीत, सातारा प्रकरणात आपले धोरण काय आहे, हे राज्य का उत्पन्न करीत आहोत आणि रेसिडेण्ट म्हणून तुमची नेमणूक होणार, तेव्हा कोणत्या डिप्लोमॅटिक (दगलबाजी) पॉलिसीने तुम्ही महाराजाशी वागायचे आहे, याच्या तपशीलवार सूचना देणारे एक पत्र (ता. ८ एप्रिल १८१८) अलपिष्टनाने ग्रॅण्टला पाठविले. त्यातले इषारे सारांशात येथेच दिल्यास, आंग्रेजी कारवाईचे पुढले पाचपेच समजायला अडचण पडणार नाही. शिवाय, आंग्रेजी मुत्सद्दी- तेव्हा काय नि आता काय, प्रत्येक मुकाबल्याच्या सृष्टी-स्थिति-लयाचा बिनचूक नकाशा तयार करूनच, दूरदर्शीपणाने राजकारणाचे डाव कसे खेळतात, याचेही प्रत्यंतर पटेल. या महत्त्वाच्या पत्राचा भावार्थ असा.
सभोवारच्या छाया पडछाया
‘‘गवर्नर जनरलची मंजुरी मागविलीच आहे. पण ती येईपर्यन्त भी तुम्हाला सातारा राज्याचे रेसिडंट म्हणून नेमीत आहे. मराठ्याचे हे छोटेखानी संस्थान निर्माण करण्यात आपले उद्देश काय नि ते साधण्यासाठी काय काय केले पाहिजे, याची रुपरेषा मी तुम्हाला कळवीत आहे. शिवाजीच्या जुन्या राजघराण्यातल्या वंशजाना मानमरातबाने रहाता यावे आणि पेशव्याच्या बामणी सत्तेच्या उरल्यासुरल्या वचकाला नि वजनाला पायबंद पडावा, या हेतूने ही सातारची गादी ठेवण्याचे गवर्नर जनरलने योजिले आहे.
आपल्या कंपनी सरकारच्या नोकरीत ठेवण्यालायक नाही असा लष्करी पेशाचा शिपायीवर्ग या संस्थानच्या गळ्यात बांधला म्हणजे त्याच्या खर्चाची ब्याद परस्पर भागेल. (आणि राजालाहि आपले सैन्य आहेसे वाटेल.) शिवाय आज आपल्याला पोसता न येणाऱ्या कित्येक धार्मिक नि सामाजीक संस्था आहेत, त्या जगवायलाहि या संस्थानाच्या तिजोरीचा उपयोग होईल.’’
"हे हेतू साधण्यासाठी पहिली जरूरीची गोष्ट म्हणजे तुम्ही महाराजांचा पुरेपूर विश्वास संपादन केला पाहिजे. शिवाय ग. ज. कडून वेळोवेळी येणारे हुकूम आणि या प्रदेशात आपल्या ब्रिटीश सत्तेच्या हुकमतीचा पक्का टिकाव या दोन गोष्टीचा तोलहि सांभाळणे अगत्याचे आहे. हे झाले नाही तर सारे गाडे उलटून आपल्या अंगलट येईल आणि साताऱ्याच्या राजाची सुटका म्हणजे बामण पेशव्याच्या दगाबाजीच्या अध्यायाच्या मागील अंकावरून पुढे चालू अवस्थेला आपल्याला तोंड द्यावे लागेल.’’
‘‘आपल्या वजनाचा नि हुकमतीचा सोळा आणे उपयोग करता येण्यासारखीच राजाची आजची अवस्था आहे. आत्ताच तो बंदीवासातून सुटून राज्याचा अधिपति म्हणून मिरवणार आहे. हे स्थित्यंतर काही त्याच्या परिश्रमाचे फळ नाही. ब्रिटीश सरकारच्या मेहरबानीचे ते फळ आहे. याबद्दल त्याला कृतज्ञता तर वाटतच आहे. यातच हरएक बाबतीत आपल्या तोंडाकडे पहाण्याची परिस्थिती आपण कुशलतेने निर्माण केली, तरच हा संस्थान निर्मितीचा खटाटोप आपल्याला फायदेशीर होणार आहे. आज राजापाशी काय आहे? ना मुलूख ना सत्ता, ना सैन्य! भवितव्याची बात कशाला? आज उदरनिर्वाहासाठी तो दमडीला महाग असल्यामुळे, आपल्यावरच त्याला सर्वस्वी अवलंबून रहाणे प्राप्त आहे.’’
‘‘या राजाला कशाचाच काही अनुभव नाही. त्याच्या भवतालचे दरमारीहि त्याच मासल्याचे लेकाचे सारे आपल्या खानदानीचा बडेजाव मिरवणारे. पण कोणी सांगावे? चालू परिस्थितीचा सोयीस्कर फायदा घेऊन, स्वार्थ साधणारे त्यांच्यात काही कारस्थानी पिसाट निघालेच तर आपण बसवीत असलेल्या यंत्राची घडी विस्कटण्याचा संभव फार म्हणून, मिस्टर ग्रॅण्ट, तुम्हाला फार चतुरायीने नि चिकाटीने वागले पाहिजे.’’
‘‘आता एकदम महाराजांचा दरबारी नि खासगी सुद्धा सारा कारभार तुम्ही आपल्याच हाती घ्या. सध्या सैन्य आपले नि खर्चहि आपलाच, राजाची हुशारी पाहून, देशात स्थिरस्थावर झाली. संस्थानची गंगाजळी सुधारली. म्हणजे थोडथोडा मुलूख नि कारभार हत्या हप्त्याने त्याच्या हवाली करायचा आहे. हरएक लहानमोठ्या खासगी नि दरबारी बाबतीत रेसिडंटाच्या सल्ल्याशिवाय काहीहि करायचे नाही, असे मी राजाला अगोदरच बजाऊन ठेवलेले आहे.
तसेच, सध्या देशात सगळीकडे बंडाळी अंदाधुंदी चालू आहे, म्हणून तुमच्याच कल्याणासाठी ही रेसिडंटाची योजना मी करीत आहे. हेहि त्याला चांगले पटवून दिलेले आहे. या अवधीत तुम्ही आमच्याशी कसे वागता. राज्यकारभारात किती हुशारी दाखवता, यावर पुढील सर्वाधिकाराचा प्रश्न अवलंबून राहील. असा इषाराहि मी राजाला दिलेला आहे.’’
‘‘आपण जे काही करतो ते सारे निस्वार्थ बुद्धीने महाराजांच्या कल्याणासाठीच करतो. हे वरचेवर राजाला पटवून, त्याचा आपल्यावर पुरापुरा विश्वास बसऊन घेणे, अगत्याचे आहे... राज्यकारभाराच्या खाचाखोचा त्याला नीट समजावून देत जा. त्याच्या आक्षेपांचे समजूतदारपणाने निराकरण करीत जा आणि राज्यकारभाराची व्यापक तत्वे त्याला नेहमी शिकऊन, त्याला त्याची गोडी लागील, अशी कोशीस करा.’’
मान्यतेसाठी जाहिरनाम्याचा पक्का खर्डा
करंज्याहून त्याच दिवशी साताऱ्यास जाण्यासाठी निघण्यापूर्वी बेलसर येथे महाराजानी ठीक आहे म्हटलेला जाहिरनामा कलमबहादर बाळाजीपंत नातू याने पक्का (फायनल) लिहून महाराजांच्या अखेर मान्यतेसाठी आणला. त्यात "छत्रपति महाराजाना पेशव्यांनी कैदेत टाकले होते आणि सर्व सत्ता पेशवा बळकावून बसला होता. इंग्रेजानी महाराजाना पेशव्यांच्या कैदेतून सोडविले आणि आज गादीवर बसविले.’’ हे वाक्य पहाताच प्रतापसिंह संतापला.
तो म्हणाला- "बेलसरला वाचून दाखवलेल्या मसुद्यात हे वाक्य नव्हते. आजच का घुसडले? ही अगदी खोटी वस्तुस्थिति आहे. मी पेशव्याचा कैदी कधीच नव्हतो. पेशवा शिरजोर झाला, म्हणून मी तुमच्या दोस्तीचा यत्न केला." तुमच्या नि पेशव्यामध्ये बेबनाव झाला तेव्हा मी तुमच्या बाजूला आलो. शिवाय, गादीवर मी १० वर्षांपूर्वीच बसलो. आज नव्याने माझा राजाभिषेक होणार, असे मुळीच नाही. ही वस्तुस्थिति असता, हा अगदी निराळाच मजकूर नव्याने जाहिरनाम्यात का घातला? मी तो कधीच मान्य करणार नाही. काढून टाका हा, बाळाजीपंत.
अलपिष्टन आणि ग्रॅण्ट दोघेहि जवळ होते. महाराजांचे म्हणणे खरे होते हे ते जाणून होते. पण आतापर्यन्त त्यानी जो राजकारणी बनाव घडवून आणला होता, त्याच्या सफाईदार पूर्तीसाठी या वाक्याची फार जरूर होती. जाहिरनाम्यात तो मजकूर म्हणजे महाराजांचा जाहीर कबुली जबाब होणार होता तो. विलायतेला डायरेक्टराना दाखवण्यास अत्यंत महत्वाचा मजकूर तोच हवा होता. पण चाणाक्ष प्रतापसिंहाने त्यालाच कडवा आक्षेप घेतल्यामुळे अलपिष्टनाला मोठा पेच पडला.
माईसाहेबहि गोग्यामोच्या झाल्या. ‘‘हे काय हो साहेब, सुरवातीलाच जर असे ध चे मा होत गेले, तर पुढे तुमच्या आमच्या दोस्तीचा प्रपंच कसा काय चालायचा?" ग्रॅण्टने मध्यस्थी करून प्रकरण मिटविले. तो म्हणाला - आम्ही महाराजांच्या इच्छेपलिकडे नाही. हे वाक्य दरबारात वाचले जाणार नाही अशी मी हमी घेतो. हे कलम गाळले असे समजावे.
नंतर एकदम कर्णे तुताऱ्या शिंगे वाजू लागले, बादशाही थाटाच्या मिरवणुकीने छत्रपतींची स्वारी सातारा राजधानीकडे निघाली. सातारच्या नागरिकांचा आनंद काय वर्णावा? आज कित्येक पिढ्यानी नि वर्षानी, नोकर पेशव्याच्या बंदीतून मुक्त झालेले आपले हिंदुपदपातशहा छत्रपति स्वतंत्र मऱ्हाठशाही स्वराज्याचे धनि नात्याने राजधानीत येणार म्हणून सर्वांनी सारे शहर भरगच्च शृंगारले. तोरणे कमानी उभारल्या आणि हजारो स्त्री पुरुष मुले दिवाळी दसऱ्याचा पोषाख करून मिरवणुकीची वाट पहात सीमेवर उभे राहिले. इकडे कंपनीच्या अंमलदारांनी संबंध राजवाडा ठाकठीक शृंगारून, दरबारचा बंदोबस्त करून ठेवला.
प्रकरण ६ वे
अखेर साताऱ्याला पाय लागले
करंज्याहून छत्रपतींची स्वारी दुतर्फा रस्त्याने रयतेचे मुजरे घेत घेत दोन प्रहरी सातार्याच्या राजवाड्यात दरबार मंडपात आली. शहरात नागरिकानी महोत्सव साजरा केला. आनंदोत्साहानिमित्त तोफांची घडेबाजी चालू झाली. रणवाद्यांचा नि मंगलवाद्यांचा गोंगाट उडाला. अलपिष्टनादि मोठमोठ्या गोर्या हापसरांच्या पुढारपणाखाली महाराजांचे स्वागत, तक्तारोहण, जाहिरनामा वाचन वगैरे दरबारी समारंभ थाटामाटात साजरे झाले.
"अखिल मराठी साम्राज्याचा आपला धनी छत्रपति आता स्वतंत्र मुखत्यारीने राज्य चालवायला राजधानीत परत आला. या कल्पनेने तमाम महाराष्ट्रात आनंद झळकला. आज रोजी (११ एप्रिल १८१८ शनिवार) छत्रपति महाराजांना सातार्यास आणून गादीवर बसविले. ते सिंहासनारूढ झाल्यावर दरबार भरविला. शहरवासियांनी आनंदोत्सव केला." असा अलपिष्टनाने खास घोडेस्वार पाठवू आपल्या वरिष्ठांकडे रिपोर्ट धाडला. इतकेच नव्हे तर थेट विलायतेच्या डायरेक्टराना ही बातमी शक्य तितक्या लवकर समजावी, म्हणून आफगाणीस्तान इराण इराकच्या मार्गे खास ओवरलॅण्ड टपाल सांडणीस्वाराबरोबर रवाना केले.
दुसऱ्या दिवशी अलपिष्टनाने महाराजांना नि राजकुटुंबियाना थाटाची मेजवानी दिली. दरबारच्या लोकांना मौल्यवान पोषाख दिले. कित्येकाना जवाहिराचे दागिनेहि वाटले. ठिकठिकाणाहून आलेल्या जहागिरदारानाहि महाराजांच्या मुलाखति करवून, मेजवान्या देणग्यानी संतुष्ट केले. आहाहा! केवढे हो हे गोरेलोक माणुसकीचे! बस्स, दोस्ती करावी तर अशांचीच. या भावनेच्या जादूने तमाम लोक आंग्रेजांवर निहायत दिलखुष होऊन गेले.
दरबारात पूर्वी सांगितलेला जाहिरनामा, आक्षेपित कलम वगळून, वाचण्यात आला. मात्र ते कलम जाहिरनाम्याच्या कागदावर शिल्लक उरले ते उरलेच. क्लैवने कलकत्त्याच्या उमीचंदाला खोटा दस्तऐवज करून जसे फसविले, तोच आंग्लाई संभावीतपणा अलपिष्टनाने केला.दरबार आटोपल्यावर महाराज, माईसाहेब, अलपिष्टन, ग्रॅण्ट नि बाळाजीपंत नातू वगैरेची एक खासगी बैठक झाली. विठ्ठलपंत महाजनी यास दिवाणगिरी, बळवंतराव मल्हार यास चिटणिसी,बळवंतराव राजे भोसले यास सेनापतीचा अधिकार, वगैरे नेमणुका ठरविण्यात आल्या. छत्रपतीची दिवाणगिरी मिळाली नाही म्हणून नातू आंबट तोंड करून बसला होता. अलपिष्टनाने त्याला ग्रॅण्ट रेसिडंटाचा मदतनीस म्हणून सातार्यासच कायम केले.
पुढे निघाला स्वराज्याच्या हद्दीचा प्रश्न. तेव्हा, रसेलसाहेब कलकत्याहून बडे लाटसाहेबाचा कसा हुकूम घेऊन येतो, त्यावर तो लोंबकळत ठेवून, ही बैठक बरखास्त झाली. रावबाजीने प्रतापसिंहाचे नाव `शाहू` ठेवले होते ते बदलून, खर्या प्रतापसिंहनावाचे शिक्के चालू करण्यात आले. ता. १३ एप्रिलला छत्रपति किल्ल्यावर रहावयासगेले.
ग्रांटच्या मुतालिकीचा जाहिरनामा
ता. १९ एप्रिलला प्रतापसिंहाकडून ग्रांटने आणखी एक जाहीरनामा प्रसिद्ध करविला. तो असा. कंपनी सरकारची व या सरकारची दोस्ती होऊन स्वारी सातार्याच्या पदावर सिंहासनारूढ झाल्याची पत्रे सादर झाली आहेत. त्यांत सरकारात जो मुलूख होईल त्याची आबादी व्हावी व रयतेस उपद्रव करणाऱ्यांचा बंदोबस्त व्हावा व जे गैर चालतील त्यांस शिक्षा होऊन या सरकारची उत्तम रीत सरकारात प्रगट व्हावी, याजकरिता ग्रॅण्टसाहेब बहादूर यास आज्ञा केली असे. तरी मशारनिल्हे ज्या तन्हेने मुलखाची आबादी होईल ते करतील व जे गैरराहा चालतील व सरकार कामांत प्रतारणा करतील व रयतेस उपद्रव देतील, त्यांस हे शिक्षा करतील. हे सर्वांस महशूर व्हावे.
सुतकातच समारंभ उरकले!
बापाच्या मृत्यूच्या १३ व्या दिवशी त्याचे तेरावे घालण्या ऐवजी प्रतापसिंहाला राजबाजीने, धर्मकर्माच्या भावना खुंटीवर अडकऊन, राजगादीवर बसविण्याचा समारंभ उरकून घेतला होता. तेराव्यालाच बारशासारखा तो प्रकार झाला. आता अंग्रेजांच्या, मेहरबानीने प्रतापसिंहाची सातार्याला पुनर्स्थापना झाली, त्यावेळीहि त्याचे ग्रहमान पिडलेले असावे, स्थापनेपूर्वी अवघे पांचच दिवस वासोटाच्या किल्ल्यावर प्रतापसिंहाचा पुतण्या अल्पवयी बाबासाहेब राजे भोसले (भाऊसाहेबाचा मुलगा) भाजून मरण पावला होता. स्थापनेनंतर अवघ्या चारच दिवसानी रावबाजीने कैद करून ठेवलेला चुलता भर्द चतुरसिंग भोसले कांगोरीच्या किल्ल्यावर बंदिवासाचे हाल भोगून मरण पावला. तात्पर्य, राज्यप्राप्तीचा सारा सोहाळा सुतकातच साजरा केला गेला. ही गोष्ट मनाला लागून रहाण्यासारखीच झाली.
चतुरसिंगाची अखेरची धडपड
चतुरसिंग कांगोरीच्या किल्ल्यावर तुरुंगात होता; तरी देशात सर्वत्र चाललेल्या राजकारणाचे साद पडसाद त्याच्या कानावर जात येत होतेच. रावबाजी विरुद्धआंग्रेजानी हत्यार उपसल्याची बातमी त्याला लागताच आणि खुद्द छत्रपतीच्याहि मसलतीचे धागेदोरे अलपिष्टनापर्यंत पोचल्याचे समजताच त्यांने अलपिष्टनाशी आपल्या मुक्ततेसाठी गुप्त पत्रव्यवहार चालू केला. ‘आपण मला मुक्त करून हाताशी एक दोन पलटणी द्याल, तर पेशव्याला उखडण्याच्या कामी मी तुम्हाला मदत करीन. मी लढवय्या आहे. का उगाच तुरुंगात कुझून मरूं देता?` अशा आशयाचा तो : पत्रव्यवहार होता. त्याचे शेवटचे पत्र ता. २५ जानेवारी १८१८ चे (पै.द. ४१ नं. १८४) अलपिष्टनाला गेले होते. ते असे__
श्रीसांब
हेरंब
अजम क्रम आलपिष्ट साहेब व करणेल साहेब इंग्रज माहादर दाम मोबत हूँ
छ अजि दिल एकलास चतुरसिंगराजे सेनासाहेब सुभा सलाम बाजत सलाम की दिगर र खुषी कलमे करीत जाती विशेष राजश्री बाजीराव पेशवे वाणी आमच्या राज्याचा बंदोबस्त करून आम्हास कैदेत ठेऊन कारभारात करीत आहेत. हाली फौज पाठवून नाना प्रकारचे उपद्रव आम्हास करीत आहेत. व माहाराज छत्रपति यासहि आपले बरोबर फिरवीत आहेत. या प्रकारे आमची आवस्ता आहे. म्हणोन पेसजी तुम्हास पत्रे पाठविली होती. त्यास दोन महिने जाहाले. आद्याप उतर कागदी आले नाही. याजकरिता हाली पत्र पाठविले आहे.
तरी या समई आम्हास कुमकेस दोन पलटणे पाठवून द्यावी म्हणजे इकडून बंदोबस्त करीत येतो. भेटीनंतर बोलणे होऊन तुमचे आमचे विचारें जे करणे ते करावयासी येईल. परंतु लिहिल्याप्रमाणे पत्र पावताच दोन पलटणे पाठवावी. वेविसी गोविंदराव गाईकवाड पाठविले आहेत. मुखजबानी सविस्तर बोलतील ते समजोन घेऊन पलटणसुधा रवानगी करावी. चितात कोणयेक अंदेशा आणू नये. रा छ २९ रोयल जादा काये लिहिणे.
जानेवारी फेब्रुवारीचा महिना अलपिष्टनाला खच्चून गडबडीचा नि धांदलीचा असल्यामुळे त्याने चतुरसिंगाच्या विनवणीकडे लक्ष्य दिले नसेल. शिवाय जेथे तो खास मराठी राज्याचा धनीच आपल्या जाळ्यात आणण्याच्या कारस्थानात गुंतलेला, तेथे तो या बंदिस्थ सेनापतीच्या सहकार्याला कितीशी किंमत देणार? तशात चतुरसिंगाचा आदेश नि तडाखा तो ओळखून होता. असला अष्टपैलू मसलतगार प्रतापसिंहाजवळ उभा ठाकला तर त्याला जोर येणार आणि आपल्याला ज्या कागदोपत्री घालमेली करून, या पोरसवदा छत्रपतीला बनवायचे आहे. ते कार्य चतुरसिंगाच्या निकटपणाने साधणार नाही. हा दूरधोरणी विचार करूनच अलपिष्टनाने चतुरसिंगाच्या पत्राना केराची टोपली दाखविली असली पाहिजे खास.
अरे हो, पण रंगो बापूजी कोठे आहे?
वाचकांच्या लक्ष्यात एक ठळक गोष्ट आली असेल की मूळ महाराजांना मुक्त करण्यासाठी आणि मसलतीचे लोण अलपिष्टनापर्यंत नेण्यासाठी, ज्याने हजार गुप्त उघड भानगडी केल्या, वेषांतरे केली, धाडसे लढवली, तो रंगो बापूजी अष्ट्याच्या मुकाबल्याच्या घटकेला जो गडप होतो. तो पुढे भरघोस रंगत गेलेल्या नाटकाच्या एकाहि अंकाच्या एकाहि प्रवेशात चुकूनसुद्धा दिसत नाही! अष्टेयाळकी ते बेलसर, पुन्हा बेलसर ते सातारा, एवढया घाटामाटाच्या छत्रपतीच्या स्वार्या गावागाव मिरवल्या.
साताऱ्याला दरबार भरला दिवाण सेनापति चिटणिसादिकांच्या नेमणुका झाल्या. पण कोठेहि एका कोपर्यात रंगो बापूजी उभा असलेला दिसत नाही हा काय चमत्कार? सन १८१८ पासून तो १४ नवंबर १८३१ चे त्याने प्रतापसिंहाला लिहिलेल्या पत्रापर्यंत तब्बल १३ वर्ष तो होता कोठे नि करीत तरी काय होता? याचा आता आपल्याला सुगावा घेतला पाहिजे.
संकट समई महाराजांची सेवा केली. पण संकट निवारण होऊन महाराज हेतूसिद्धीच्या मार्गाला लागताच, रंगोबा मुकाट्याने बाजूला सरला. तो महाराजांबरोबर होता, पण चालू झालेल्या राजकारणात त्याने मुळीच लुडबूड अथवा ढवळाढवळ केली. नाही. निवळपणे सर्व काही तो पहात होता. दरबार भरून महाराज गादीवर बसले, तेव्हाहि मटी पिण्डाच्या मनोवृत्तीने दक्षणेचा अथवा बक्षिसाचा स्वार्थ साधण्यासाठी, हात पसरून तो पुढे झाला नाही. त्याला दरबारात अधिकाराची जागा नको होती. केवळ एकच हेतू तो उराशी घट्ट धरून बसला होता. छत्रपतीच्या चार पिढया नि त्याच्याहि चार पिढ्या निजधामाला गेल्या.
त्याच्या खापरपणज्यावर वतनाबाबत आलेल्या अन्यायाची भरपाई करून घेण्यासाठी तो धडपडत होता. त्याला पोशाख, पदवी, जवाहीर, होन, काही नको होते. रंगोबाच्या जागी एकादा चित्पावन भटजी असता, तर त्याने आपल्या खटपटीचा राईचा पर्वत करून छत्रपतीपुढे नि अलपिष्टनापुढे एकनिष्ठेचे मोठे प्रदर्शन थाटले असते आणि दक्षणा म्हणून हजारो रुपये इनाम जमीन शेतवाडीची सोय करून घेतली असती. प्रतापसिंहाच्या चरित्राच्या उत्तराधांत, त्याच्याविरुद्ध कारस्थाने करणाऱ्या कवडी किंमतीच्या भटांनी आंग्रेजांकडून भरभक्कम लाच इनामे खाल्ल्याची उदाहरणे पुढे येणारच आहेत.
प्रतापसिंह गादीवर बसताच. रंगो बापूजीने चाफळच्या स्वामीला आणि विठ्ठलपंताला विचारले की हाती घेतलेले काम सिद्धीला गेले. आता पुढे माझी वाट काय? त्यावर स्वामीनी स्पष्ट खुलासा केला की `महाराजांना मुखत्यारी मिळायला पांच वर्षे लागतील. पुढे सर्वाधिकारी झाल्यावर आणखी पाच वर्षे तुला थांबले पाहिजे, म्हणजे सर्व काही ठीक होईल.’ तरीहि स्वारीचा मुक्काम करंज्याच्या आंबराईत असताना एक योग आला. त्याविषयी रंगो बापूजी आपल्या १८३१ सालच्या पत्रात लिहितो. तो बडेसाहेब करंज्याचे बागेत आले. ते काली सर्वांचे म्हणणे पडले की आम्ही राजकारण केले. तेव्हा मी पुण्यास विश्वनाथराव याजबरोबर होतो. तेथून मला चिटणिसानी आणविले आणि बडेसाहेबापासी भेटदिले, ते काळी विठ्ठलपंतबाबा व आमात्यपंत व चिटणीस व बाळाजीपंत नातू असे होते. साहेबाने विचारले की तू चाकर कोणाचा? मग मी उत्तर केले की चाकर चिटणीसाचा, चाकरी सरकारची केली आहे.
तेवेळी मी विनंती केली की माझा बंदोबस्त (वतनाचा) साहेबानी करून द्यावा. ग्रांटसाहेब यास सागितले (कोणी? महाराजानी?) यानी चाकरी फार केली आहे. याजकरिता बंदोबस्त द्यावा, बोलले, ते वेळी कोण्हाचे पोटात काय वाकडे आले न कळे. माझे बोलणे कोण्ही बोलले नाहीत. नातूसारखा जिवंत शनिग्रह सातारच्या बेगडी दरबारच्या उरावर असताना, थोडयाच दिवसांत भल्या भल्यांची वासलाद लागली, तेथे रंगोबा कुठल्या झाडाचा पाला?
परिशिष्ठात समग्र छापलेल्या रंगोबाच्या स्वदस्तुरच्या पत्रावरून असे दिसते की चिटणिसानी त्याला अक्कलकोटला काही कामावर पाठवून दिले. तेथे असताना महाराजाविरुद्ध काही कारस्थान झाले. त्याचे पुराव्याचे कागदपत्र रंगोबाने मुंबईला जाऊन पकडले. पण त्या कटबाजानी रंगोबाला पकडून बेडी ठोकून कैदेत टाकले. या बाबत "हे संस्कार पेशजीचे राजकारणात हपत्याची बाकी राहिली होती ती जप्ते याणी केली." असे तो म्हणतो, यानंतर तो ईस्ट इण्डिया कंपनीच्या नोकरीत गेला.
कारण २१ दिसेम्बर १८१८ च्या महिदपुरच्या लढाईत कॅप्टन ब्रिग्ज बरोबर रंगोबाहि हजर होता. `तारीख ३ माहे डिजंबर सन १८२० इसवी रोजी त्याने लिहिलेल्या पत्रावरून (पे, द. ४१ नंबर २५९) तो कंपनी सरकारचा आमीन (मामलतदार) म्हणून नाशिक खानदेशी पेशवाई अमलातले गाय गड कोट किल्ले कंपनी सरकारात रुजू करण्याच्या कामावर असलेला दिसतो. (पत्र परिशिष्टात छापले आहे.)
ठाणी जिंकून तेथे कंपनी सरकारचा अंमल बसवायचा, विरोध होईल तेथे प्रथम सामदाम दण्ड भेदादि यत्न फसल्यावर चक्क लढाईचा सामना द्यायचा, ही कामे तो करीत होता. “नंतर किले कावनई व गडगडा व त्रिगळवाडी हे तीन किले पेशव्याकडील अमलात आमचे व्याह्याकडे होते. ते किले हस्तगत होईनात. तेव्हा बनेल त्या रीतीने त्याची खातरजमा करून भेटीस म्हणोन बोलाऊन आणून घरून घेऊन साहेब बहादुर याचे जवळ हजर केले आणि तिनी किल्ल्यावर ठाणी कायम केली.
या प्रमाणे कितेक किले व महाल लढून व कितेक फूस लाऊन घेतले. मधेमधे पेशव्याकडील फौजेची व रूपराम चौधरी त्याचे पलटणाची गांठ पडून तेथे छापा वगैरे घालून साहेबाचे प्रतापे पराभवाते पाठविले व लूट तोफा वगैरे सरंजाम सापडला तो सरकार दाखल केला." या मजकुरावरून रंगोबाने कंपनी सरकारचीहि आमीनदारी कमाल कसोशीने नि निष्ठेने बजावली. हे दिसून येते.
कंपनीच्या नोकरीचा इत्यर्थ
पहिल्यापासूनच रंगोबाचे घराणे गरीबीचे हक्काने जमीन कसून भाकरी खावी. तर वतनाची वाट लागलेली. तेव्हा चिटणीसांच्या सावलीत पडेल ती छत्रपतीची सेवा करायची, एवढेच या घराण्यातल्या मंडळीनी केले. प्रतापसिंह गादीवर आला, चिटणीस: फडणिसादि मंडळी आपापल्या कामावर रूजू झाली, ग्रॅण्ट नि नातू यांचा कारभार चालू झाला आणि रंगो बापूजी तेवढा उघडाच राहिला.
अक्कलकोटाहून तो निघाल्यानंतर, लवकरच कंपनीच्या अलपिष्टनादि अधिकाऱ्यांनी त्याला आपल्या नोकरीत घेतले. ते सारे रंगोबाचे पाणी ओळखून होते. हातात घेतलेल्या कार्यासाठी हा इसम काय उचापति करील नि काय नाही, याची त्यांना पुरी माहिती होती. त्रिंबकजी डेंगळ्यासारख्या जहांबाज जबरदस्ताच्या कडेकोट अटकेत असलेल्या प्रतापसिंहाची ज्याने अनेक हिकमती संघाने नि मसलती लढवून अखेर सुटका करविली.
असला असामी यापुढे छत्रपतीच्या आसपास ठेवणे जसे आंग्रेजी धोरणाला पथ्यकर नव्हते, तसे त्याला रिकामे भटकायला सोडणेहि घातकच होते. स्वराज्य नि स्वातंत्र्याच्या तिरमिरीने, छत्रपतीच्या पुनर्घटनेसाठी, ज्यानी स्वकीय पेशव्याचाहि चेन्दामेन्दा करविण्याच्या कारवाया केल्या, ते रंगोबासारखे छत्रपतीनिष्ठ आम्हा परकीय नि उपर्या गोऱ्या लोकांची जराशी बदचाल दिसताच केव्हा कसे चुटकीसरसे आम्हाला तडाड उखडण्याचा व्यूह रचतील, याचा नेम नाही. ही जाणीव आंग्रेजाना चांगली होती. म्हणूनच अलपिष्टन ग्रँट नातू अॅण्ड कंपनीने रंगोबाला प्रतापसिंहापासून दहा हात दूर ठेवण्याचा बंदोबस्त केला आणि संधि दिसताच त्याला आपल्या नोकरीत अडकवून टाकले.
यात आग्रेजांचा धोरणीपणा जसा दिसतो, तसा प्रतापसिंहाचा बेदादपणा स्पष्ट सिद्ध होतो. संकट समयी आपल्यासाठी कोण कोण खर्ची पडले, याची त्याने चौकशीच केली नाही, मराठे नृपतींचा हा बेदर्दीपणा आजदिन तागायत जशाचा तसा चालू आहे, याचा वाईट अनुभव प्रस्तुत लेखकाने चांगलाच घेतला आहे. एका करवीरकर शाहू छत्रपतीशिवाय बाकीचे सारे मराठे संस्थानीक कामापुरता हवा त्याला मामा म्हणतील. काम झाले का मग त्याना कोणाचीच आठवण रहात नाही. असो. १३-१४ वर्षांनी आंग्रेजांची नातूप्रासादीक कारस्थानांची तात प्रतापसिंहाच्या मानेभोवती मरामर गुंडाळली जाऊ लागली, तेव्हा त्याला रंगो बापूजीची आठवण कशी झाली, हे आपण पुढे पहाणारच आहोत.
एक गोष्ट ठळक दिसते. प्रसंगाप्रमाणे पडेल तो व्यवसाय केला, तरी रंगो बापूजी आपल्या छत्रपतिनिष्ठेत लवमात्र चळला ढळला नाही. सन १८३१ साली केव्हा तरी त्याच्या स्वाभिमानाला धक्का लागून त्याने कंपनीच्या नोकरीवर लाथ मारली असावी. म्हणूनच प्रतापसिंहाला पत्र पाठवून त्याने आपल्या अस्तित्वाचे नि हलाकीचे त्याला स्मरण करून देण्याचा यत्न केलेला दिसतो, रावबाजी पेशव्याच्या सर्व उघड गुप्त हालचाली, बातबेत आणि ठावठिकाणे जेव्हाच्या तेव्हा कळविण्यासाठी, कंपनीच्या अधिकान्यांनी शेकडो ब्राम्हणाना भरपूर तनख्यावर गुप्त हेर म्हणून जागोजाग महाराष्ट्रभर पेरून ठेवलेले होते.
पेशवाई घशात पडल्यावर त्या सगळ्यांची चंदी बंद झाली. अशा अनेक मंडळीनी अलपिष्टनादि अधिकाऱ्याना आपापल्या कामगिरीचे तक्ते पाठवून "आमची काही तरी कायमची सोय लावा." अशा आक्रोशाचे पुष्कळ अर्ज पेशवा दफ्तर नं. ४१ मध्ये छापलेले आढळतात. रंगो बापूजीने असा एकहि यत्न केला नाही. त्याने विश्वासाने छत्रपतीकडेच धाव घेतली. परिस्थितीप्रमाणे कंपनीची अमीनदारी पत्करली. निष्ठेने चोख कामगिरी बजावली आणि स्वाभिमानाला पटेनासे होताच दिला तो मार्ग सोडून, यापेक्षा रंगोबाच्या कंपनीच्या नोकरीच्या मुद्यात विशेष ब्रह्म काहीच नाही. मात्र, लंडनला चवदा वर्षे ठाण मांडून, कंपनीच्या हिंदवी कारवायांच्या चिंधड्या चिंधड्या उडवणारा रंगो बापूजी एक वेळ त्याच कंपनीचा नोकर होता. ही गोष्ट मोठी मनोरंजक तर खरीच.
आता रंगोबाला येथेच सोडून आपल्याला प्रतापसिंहाच्या नव्या जीवनाचा ओघ कसा काय चालला आहे. तो पाहिला पाहिजे. चला पुढे.
प्रकरण ७ वे
ग्र्याण्टसाहेब गुरु नि छत्रपति चेला
मराठ्यांचा इतिहास अत्यंत परिश्रमाने स्वार्थत्यागाने आणि आवडीने इंग्रेजीत लिहून पहिल्यानेच प्रसिद्ध करणारा जो सुप्रसिद्ध गॅण्ट डफ तोच कॅपटन जेम्स ग्रॅण्ट डफ सातार्याचा कंपनी सरकारचा पहिला रेसिडंट, याने प्रथम आपली कचेरी आंग्रेजी टापटिपीने थाटून, प्रतापसिंहाला तसा कित्ता गिरवायला लावले. कचेरीच्या वेळा ठरवून, कामदार कारकुनानी ठरल्या वेळीं बिनचुक यावे. हा नियमितपणाचा नवीन धडा ग्रँण्टनेच मराठशाहीत प्रथम चालू केला. स्वारानी नि हुजरे शिपायानी एका दस्तुराची पागोटी व आगरखे घालावे, अशी युनिफॉर्म पोषाखाची पद्धत चालू केली.
खुद्द महाराजानीहि आपल्या खास कचेरीत ठरल्या वेळी नियमित येऊन कामकाज पहावे, न्याय निवाडे करावे. रोजचा जमाखर्च तपासावा आणि रात्री निजण्यापूर्वी प्रत्येक दिवसाच्या दिनचर्येची कोणकोण भेटले, का भेटले, काय कामे केली, देवदर्शन, प्रवास, सणवार, वादविवाद इत्यादि सगळ्या प्रसंगांची हकिकत -- तपशीलवार लिहून ठेवीत जावी, (अव्वल इंग्रजीतील सामाजिक, धार्मिक नि राजकीय घडामोडींचा संपूर्ण तपशील प्रतापसिंहाच्या या डायरीत पहायला मिळतो. पेशवे दप्तर ४२ वे पुस्तक मुद्दाम पहावे.) असाहि त्याने दण्डक घातला.
प्रतापसिंह जात्याच प्रागतिक पिण्डाचा असल्यामुळे ग्रॅण्टच्या प्रत्येक सुधारणेच्या सूचना तो भराभर आत्मसात करू लागला. महाराजांनी धर्माच्या नावाखाली भटाबामणांना दक्षणेची वारेमाप उधळपट्टी करूं नये, आपला बडेजाव दाखवण्यासाठी लोकांना किंवा सरदार दरकदारांना विनाकारण देणग्या बक्षिसांची खैरात करू नये, वाजवी तेवढाच खर्च करून आबादाबात रहावे आणि सरकारची गंगाजळी वाढती ठेवण्याची अंखड विवंचना बाळगावी असल्या सर्व बाबतीत ग्रँट प्रतापसिंहाला वरचेवर सूचना देऊन त्याच्या वर्तनावर निहालचालीवर कड़वी नजर देऊन बसला होता. दररोज ठरल्या वेळी तो प्रतापसिंहाला भेटायला यायचा नि बारीकसारीक गोष्टींची चौकशी करायचा. ३० ऑक्टोबर १८१८ ची नोंद पहा.-
"ग्रांट आले जमाखर्चाची वही सरंजामे यांची दाखविली. वहीवर जमा महाराजांचे नावे केली. तकसीरदार (गुन्हेगार) याचे पारपत्याचे व फासी देण्याचे पर्याय बोलिले, नंतर वाकबगारीचे पर्याय. कोणी फिर्याद केली तरी लागलीच जफती करूनये. चौकसीने करावे. माहाराजाचे हातास मुलूक जलद आला, तर चौकसी मीट ब्राम्हण लोक करणार नाहीत. माहाराज दस्तूर चांगला समजो लागले व कंपणी सरकार इतलाने करणे ते कळऊन करावे. म्हणजे काम दुरस्त होईल व ब्राम्हणलोक पैकाहि खाणार नाहीत."
लांचलुचपतीबाबत ग्रांटाने प्रतापसिंहाला चांगलेच दहशतवादी बनवले होते. रेसिडेन्सीतल्या एका गोर्या साहेबाने एका चपराशाच्या मार्फतीने एक बकरा ४ रुपयाला विकत घेतला. त्यात त्या चपराशाने २ रुपये धनगराला दिले आणि २ रुपये स्वत ‘पागडी’ म्हणून हबकले.
महाराजांना हे समजताच त्यानी त्या चपराशाला मुसक्या बांधून आणविले आणि खांबाला बांधून चव्हाट्यावर येताच्या छडीचे एका जागी ५०० तडाखे लगावून चोप दिला. प्रतापसिंह बाहेर दाखवतो तसा तो आंतहिवागतो का नाही, याचीहि ग्रांट गुप्त चौकशी करीत असे. एकदा त्याने विठ्ठलपंताला विचारले. काही महाराज आपली डायरी लिहितात का नाही?
विठ्ठल - लिहितात तर. परंतु कारकुनासारखे आताच आज कसे होईल?कारणबाजीराव यांनी काही एक विद्या सिको दिली नाही. परंतु हली लिहितात.
ग्रांट - लिहीत असले तरी राज्य आज नाही उद्या हस्तगत होईल. परंतु या सार्या गोष्टी बालाजीपंतास कलऊ नका. तुम्हीहि कळू देऊ नयेत व महाराजानाहि कळऊ नयेत.
एवढेच काय, पण महाराजानी आपली पत्रे लिहावी कशी, याच्याहि सूचना ग्रांटने केल्या. ‘कागद माफतीचा असावा’ (चार ओळीसाठी सबंध बंद वापरू नये.) माथ्यावर ‘श्रीमंत महाराज छत्रपति प्रतापसिंह राजे भोसले’ अशी ठळक अक्षरे असावी. पत्रांकासाठी ‘नंबर’ शब्द वापरू नये, ‘आंख’ शब्द लिहावा. पत्रात ‘येवनी शब्द लहू नये. महाराष्ट्र शब्द लिहावे’ इतक्या बारीकसारीक गोष्टीतहि ग्रँटने प्रतापसिंहाला तरबेज नि वाकबगार करण्याची मनोभावाने कसोशी चालविली होती.
नातूने आपले कावळे जमवले
ग्रांटचा मदतनीस (असिस्टंट रेसिडंट) म्हणून बाळाजीपंत नातू हरहमेष महाराजांकडे जात येत असे. ती त्यांची ड्युटीच होती म्हणाना ‘अज्ञान’ छत्रपतींचे ‘पालनकर्ते’ कुंफणीसरकार, त्यांच्या रसिदंटाचा मी असिस्टंट या प्रौढीचा डौल महाराज नि माईसाहेब यांच्यापुढे नातू हटकून मिरवीत असे. त्याला पहाताच दोघांच्या कपाळाला आठ्या पडत. हे नातू ओळखून असे. सातार्याला रसिदंटाची कचेरी चालू होताच, मुजावर नातूने सगळ्या कारकुनांच्या जागा आपल्या जातभाई चित्पावनानी भरून टाकल्या.
गोर्या रसिदंटाच्या हापीसातले आम्ही कारकून, आमच्यापुढे छत्रपति नि त्यांचे ते जातभाई मराठे कोणत्या झाडाचे पाले? अशा आढ्यतेने ते चित्पावन कारकुंडे महाराजाकडील माणसे कामानिमित रेसिडेन्सीत गेली, का त्यांची टिंगल टवाळी करायचे, तिटकार्याने वागावायचे, ही गोष्ट महाराजांच्या कानावर जाताच, त्यानी चारचौघासमक्ष तात्या अभ्यंकर नावाच्या कारकुनाला बोलावले आणि खडसावून विचारले "काहो, आमची मंडळी तिकडे साहेबाकडे गेली म्हणजे त्याना तुम्ही चितपावन राग करून घालवावयाचे बगतात. ते कां? खबरदार पुन्हा असला चावटपणा कराल तर. ग्रांटाच्या कानावर घालून मी याचा पुरता बंदोबस्त करीन." तेथेच साक्षी पुरावा नि खर्या खोट्याची समक्ष रुजुवात झाल्यामुळे, तात्या अभ्यंकराने चुकलो म्हणून हात जोडून महाराजांची क्षमा मागितली.
(चित्पावनांचा हा तुसडा स्वभाव आजहि होता तसाच कायम आहे. एकाद्या हापीसात एक चित्पावन घुसला पुरे का थोड्याच दिवसांत ते सगळे हापीस चित्पावनमय होऊन जाते आणि ते बाकीच्याना सारखे पाण्यात पहातात. हा देखावा आजहि सर्वत्र पहाण्यात येतो. सार्वजनिक हितवादाची पुराणे झोडणार्या कै. टिळकांच्या केसरी पत्राच्या कचेरीत एकजात एकरकमी चित्पावन पराची पाखरे असतात, हे महाराष्ट्राबाहेर फारसे कोणाला माहीत नाही.)
‘‘किल्ले सारे पाडून टाका’’
ता. १ नवंबर १८१८ रोजी नातू महाराजांच्या भेटीला आला. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर म्हणाला - "महाराज, आता दक्षिणेत जबरदस्त कुंफणी बहादुर सरकारची सत्ता बळकट झाली आहे. आता आपले हे जुने गडकोट किल्ले करायचे आहेत काय? पाडून टाकावे सारे.”
आपण जे काही सांगतो बोलतो, त्याला अलपिष्टनाचा नि ग्रांटाचा प्रत्यक्ष पाठिंबा असतो, अशी नातूने महाराजांची नि माईसाहेबांची पक्की भावना करून ठेवलेली होती. त्यानाहि सध्या आग्रेजांशी जुळते मिळते घेणे प्राप्त होते. नातूचे बोलणे ऐकून महाराज म्हणाले- "प्रतापगड आमच्या देवीचा आणि परळी आमच्या गुरूचा. येथले किल्ले पाहू नये. बाकीच्या बद्दल अलपिष्टन साहेब उरवितील तसे होईल."
महाराज लढाई करतील की नाही?
१० नवंबरला ग्रांट भेटीला आल्यावेळी, महाराजांच्या मनाचा ठाव पहाण्यासाठी बोलला."बंड जाहाले आहे तरी महाराज लढाई करतील की नाही?"
प्रताप- ते वेळेस जे होईल ते खरे.
विठ्ठलपंत- लढाई बाजीरायाचे प्रसंगी पाहिली आहे. पुढेहि घेतील.
ग्रांट- जे वेळेस संकट कंपिणी सरकारास पडेल ते वेळेस दोस्ती करिता दुसमानावर गेले पाहिजे.
प्रताप- हे खातरजमा दिवसोदिवस होईल ती कंपिणी सरकारने पाहावी ऐसे आमचे बहुत मानस आहे.
ग्रांटची बखरीची योजना
दीडदोनशे वर्षांच्या निकट सहवासाने हिंदी इसमाला अझूनहि उचलता आला नाही. असा इंग्रेजांचा एक सद्गुण आहे. इंग्रेज आदमी जगाच्या पाठीवर कोठेहि भटकंतीला अगर रोजगाराला जावो, तो तेथल्या रहिवाशांचा जुना इतिहास, त्यांची रहाणी, दिनचर्या, धर्म, नीतीच्या कल्पना, उद्योग, राजकारणी उलाढाली, वगैरे हजार गोष्टींची चाणाक्षपणाने चौकशी करतो, आणि त्या पद्धतशीर संकलन करून त्यांचा इंग्लीश भाषेत ग्रंथ लिहून काढतो. यासाठी पडतील ते श्रम साहस, लागेल तो खर्च, पदराला खार लाऊन तो करतो.
आमच्या हिंदी लोकांचा खाक्याच न्यारा! सार्या जगाची यात्रा करून आले तरी सुके ठणठणीत! जंगलभर भटकून सरपणच त्याना आढळायचे नाही! ग्रांटच्या पूर्वी आमच्याकडे सभासद नि चिटणिसानी लिहिलेल्या बखरी, हकिकती, याद्या. काव्ये इत्यादि साहित्य होते. पत्रव्यवहार, तहनामे, सनदा आणि याद्यांचा पर्वतप्राय ढिगार घरोघर पडलेला होता. पण त्या सर्वांचा चिकित्सापूर्वक अभ्यास करून, अर्वाचीन तंत्रानुसार पद्धतशीर लिहिलेला मराठी रियासतीचा इतिहास म्हणजे ग्रांट डफची इंग्रेजी बखरच होय. ग्रांट डफच्या लेखनातल्या चुका पुढे अनेकांनी दाखविल्या, पण एकंदर पुढील संशोधनाला ग्रँटच्या इतिहासाचाच आधार घ्यावा लागला, ही गोष्ट नाकारण्यात शहाणपणा नाही.
ग्रांटप्रमाणेच अनेक इंग्रेज प्रवाशानी नि कंपनीच्या अधिकार्यानी हिंदुस्थानाच्या अनेक प्रदेशांचा इतिहास परिश्रमाने लिहिलेला आहे. मालकमने मध्यहिंदुस्थानचा, टॉडने राजपुतान्याचा, फोर्ब्सने गुजराथचा, मनरोने दक्षिण हिंदुस्थानचा, जेन्कीन्सने नागपूरचा विल्कसने म्हैसूरचा नि दॉकरने बडोद्याचा, असे अनेकानी अनेक इतिहासग्रंथ लिहून तयार केले.
ग्रांट सातार्याला आला तेव्हा मराठी साम्राज्य जरी बुडायला लागले होते. तरी त्याचे वैभव, दरारा आणि पराक्रम जागोजाग दिसत होता. आपल्या जातभाईंची बनिया कंपनी हे साम्राज्य घशात घालणार, ही ग्रांटची खात्रीच होती. पण तो जात्याच रसिक, स्नेहाळ नि अभ्यासू वृत्तीचा असल्यामुळे, शिवाजीसारख्या अलौकीक पुरुषाने निर्माण केलेल्या मराठी साम्राज्याचा तपशीलवार इतिहास लिहिण्यासाठी साहित्य जमविण्याचा त्याने निश्चय केला. आज तो सर्वसत्ताधारी होता. मागवील ते कागदपत्र त्याला मिळणार होते. छत्रपतींच्या राजधानीतच त्याची बैठक असल्यामुळे, मराठ्यांच्या इतिहास-लेखनाला सर्वस्वी अनुकूल नि उत्तेजक असे वातावरण सभोवार रहाळ्या मारीत होते. शिवाय अलपिष्टनाप्ररमाणे ग्रांटनेहि मराठी भाषेचा अभ्यास केलेला होता.
ग्रांटने बळवंतराय मल्हार चिटणिसाला दररोज आपल्या कचेरीत बोलावून, शिवाजीच्या वेळेपासून तो थेट प्रतापसिंहापर्यंतचे राजकारणाचे असतील तेवढे कागदपत्र, टिपणे, बखरी घेऊन येण्याचा हुकूम सोडला. ठरल्या वेळी कचेरीत येण्याचा चिटणिस पारसनिसांचा बापदाद्यांपासून कधि दस्तकच नव्हता. आणि जरा थोडा उशीर झाला तर ग्रांट लगेच हजेरी घ्यायचा. त्यामुळे या जुन्या पोषाखी दरबाऱ्यांची रोज मोठी तिरपीट उडायची.
कागद आणले का ते वाचून घेऊन, त्यातल्या बारीकसारीक मुद्यावर ग्रांट कस्सून चिकित्सा करायचा. परशियन कागदांचे मराठी भाषांतर आबा पारसनिसाकडून करून घ्यायचे आणि मराठी कागदांचे इंग्लीश भाषांतर नारायण बर्वे नावाच्या कारकूनाकडून घ्यायचे. रेसिडेन्सीतल्या सगळ्या कारकुनाना ग्रांटने घाण्याला जुंपले, चिटणिसाची तर काय रोज प्रत्येक मुद्याबद्दल, उलटसुलट तपासणी चालायची. मधूनमधून बाळाजीपंत नातू कुझकट कुशंका काढून चिटणिसाला आडवायचा. दोघांची जुंपायची. साहेबाची करमणूक व्हायची.
रोजच्यारोज चिटणिसाच्या घरचे रुमालांचे दस्तेच्या दस्ते ग्रांटाच्या कचेरीत येऊन पडू लागले. नकला भाषांतराची गर्दी उडाली. खुद्द छत्रपतींच्या ताब्यातल्या कागदपत्रांचे रुमालहि मागविण्यांत येऊ लागले. साहेबाने हे काय बण्ड माजविले आहे याची कोणालाच काही कल्पना येईना. चिटणीस पारसनिसांचा रोज पाचसहा तास घामटा निघू लागला. स्वतः ग्रांट आठआठ तास खर्डेघाशी करू लागला. कागदांतल्या मजकुरांची नि मुद्यांची छाननी करण्यासाठी निरनिराळ्या जहागिऱ्यातून, प्रतिनिधि सचीवाकडून माहीतगार माणसे बोलावण्यात येऊ लागली.
तेव्हा हे काय कारस्थान चालले आहे? आमचे कागद काय म्हणून साहेब हुकमी घेऊन जातो? या विचाराने चिटणीस पारसनीस पासे थकले नि भेदरले, तसे प्रतापसिंह महाराजहि चिंताक्रांत झाले. अस्सल अस्सल पत्रे ग्रांट नेत आहे! काय करावे? रात्री महाराजांच्या आणि चिटणिसादि हितचिंतकांच्या बैठका भरू लागल्या. ग्रांटाचा कारभार गिरमिटासारखा एकेका मसलतीचे नि मनसुब्याचे कागद पोखरून पोखरून काढू लागला. साहेबाला विचारावे तरी पंचाईत न विचारावे तर सारा दप्तरखाना रिकामा होऊ लागला!
अखेर एकदा नातू महाराजाला भेटायला आला असतां त्यानी या प्रकरणाचा खुलासा काढण्याचा यत्न केला. तेव्हा नातूने सांगितले- ‘‘सारे कागद पाहून छाप्यात छापून विलायेतेस जाईल. सर्वास महाराजांचा पराक्रम राज्ये वगैरे जाहीर होईल. इतके दिवस कागद नुसते जवळ बाळगून काय केले? आणि पुढे ठेवून तरी काय करणार? ग्रांटाचे लक्ष महाराजांचे ठिकाणी फार. असा दुसरा साहेब कोण्ही नाही, वारंवार माहाराजांची काळजी वाहणे व महाराजांचा बंदोबस्त चांगला व्हावा, आपणास येश यावे, हेच चित्तात आहे.’’ तरीही प्रतापसिंहाला काही उलगडाच होईना.
तो नातूला म्हणाला, ‘‘कागदपत्रावरी व सनदेवरी काय आहे? आम्ही दोस्ती केली मेलविली, त्याअर्थी जे देतील ते आमचे अधिक उणे काही म्हणावयाचे नाही. तुम्ही हिंदु आहा. पाहिजे ते करा. आमचे मनात आधिकउणे वाटल्यास तुम्हापासी बोलू, त्यापासी काही बोलावयाचे नाही." नातू गेल्यावर महाराज चिटणिसादिकाना म्हणाले- ‘‘जबरदस्तापुढे आग्रह करून कामाचा नाही व आग्रह करून सिद्ध करून फल होते असे नाही. होणार ते होईल. कागद आणखी आहे पुसतील, तरी नाही म्हणावे.’’
ऐतिहासीक साहित्यासाठी ग्रांटच्या कामाचा झपाटा जसजसा वाढला, तसतसा महाराज, राजकुटुंबातली मंडळी आणि दरबारी यांचा जीव खालवर होऊ लागला. ग्रांट याने जुनी चित्रे, राजपुरुषांच्या प्रतिमा बाहेर काढवून, त्या नकला करण्यासाठी मुंबईला पाठविल्या. राजघराण्याच्या वंशावळीचा शोध घेताना, "परवा साहेबाने इंग्रजी बुकात लिहिले की सिवाजीराजे याचा वंश भोसाई म्हणोन उदेपूरकर यानी ठेविली तिचा वंश" हे समजताच प्रतापसिंहादि मंडळी संतप्त झाली. रेसिडेन्सीतल्या कोणातरी शहाण्या भटाने हा ध चा मा साहेबाला सांगितला असावा. त्याचा तात्काळ फडशा करण्यासाठी प्रतापसिंह ग्रांटाच्या भेटीला गेला. इतक्यात ग्रांटाला बापू कानूचे पत्र आले की चतरसिंग जयपुरास व जोतपुरास मी उदेपुरास गेलो होतो.
तेव्हा तिही जागे चतरसिंग गेले, ‘त्यानी चतरसिंग याची मान्यता करून बोलले की सातारा व हे संथाने (संस्थाने) येकच म्हणोन राणाजी व चतरसिंग येका गादीवर बसले.’ तेव्हा त्याने ती चूक सुधारली. नंतर ग्रांटाने महाराजांना ‘धुरुची डबी’ (ध्रुवाची डबी, होकायंत्र) दाखविली. जहाजे लांबवर गेली, की या यंत्राने दिशा पाहून जहाज हाकता येते, असे समजाऊन सांगितले, सर्वांना मोठे आश्चर्य वाटले.
कागदपत्रांवरून मी महाराजांच्या राजघराण्याचा विश्वसनीय मोठा इतिहास लिहीत आहे. तो छापला म्हणजे मराठ्यांच्या साम्राज्याची सारी माहिती जगाला समजून त्यात महाराजांचाच लौकिक वाटणार आहे. वगैरे ग्रांटाने समजाऊन सांगितले. आपल्या रात्रंदिवस श्रमांची नि खर्चाची हकिकत खुलासेवार दिली. तेव्हा महाराजासकट सगळ्यांचे समाधान झाले आणि ग्रांटाच्या उद्योगाची त्यांनी वाहवा केली.
तहनाम्याच्या काटेरी पिंजऱ्याकडे
१८१८ एप्रिल पासून तो १८१९ च्या सपटेंबरपर्यन्त म्हणजे दीडवर्ष, महाराज आणि कंपनी सरकार यांचे परस्पर संबंध काय नि किती आणि छत्रपतींच्या स्वराज्याच्या नि अधिकाराच्या हद्दी कोणत्या नि कोठवर, याचा निश्चित असा काहीच उलगडा झालेला नव्हता. ग्रांटने महाराजाना सर्वतोपरी संतुष्ट राखून, आम्ही कंपनीवाले जे काही करीत आहो. ते सारे महाराजांच्या हितासाठीच, असे वरचेवर पटविण्याची कसोशी चालू ठेवली होती. नातूच्या अरेरावी लुडबुडीने महाराज नि माईसाहेब वरचेवर खूप आदळआपट करायच्या नि ग्रांटच्या कानावरहि तक्रारी घालायच्या, पण तो कसला धूर्त! `त्या कारकुनाकडे कशाला लक्ष देता? मी आहे ना` अशा खुलाशाने त्या मायलेकराना गारीगार करायचा.
महाराजांची समजूत अशी की पूर्वी रंगो बापूजी, चिटणीस नि नरसू काकडे यांच्याशी अलपिष्टनाने समक्ष शपथपूर्वक केलेल्या संकेताप्रमाणे मराठी साम्राज्याची- पेशव्याच्या सत्तेखालची सारी अफाट दौलत आम्हालाच मिळाली पाहिजे. सगळ्या महाराष्ट्रातल्या रयतेचीहि अशीच समजूत झाली होती. पेशवा हा नोकर, नोकर गेला अथवा घालऊन लावला म्हणजे मालकाची सत्ता नि मत्ता नोकराबरोबर नाहीशी झाली, ही विलायती नीति हिन्दू नीतीला पटण्यासारखी नव्हती. पण कंपनीचे विलायती मगजाचे मुत्सद्दी पक्के बनिये! ते आपला डाव धोरणाने खेळत होते. या वेळी रावबाजी ब्रह्मावर्ताला पोचला होता. अंग्रेजांपुढे काही चालणार नाही, या दहशतीने देशात थंडाई येत होती.
मराठशाहीचा सबंध घास एकदम गिळू लागल्यास, आपली गचांडी धरून तो घास खेचून बाहेर काढण्यासाठी मराठे बण्डवाले अझून निजलेले नव्हते. अकल्पित घटनेने डोळ्यासमोर घडणारी विलक्षण राज्यक्रांति ते जागरूकपणे अभ्यासीत होते. मराठा बारगीर नि त्यांचे सरदार म्हणजे गांधीलमाशांची जात. आपले धोरण जरा थोडे कुठे घसरले, तर सबंध महाराष्ट्रातले हे मोहोळ चहूबाजूनी घोंगावत येऊन आपले लचके तोडतील.
ही पुरेपूर जाणीव ठेऊन कंपनीचे मुत्सद्दी, छत्रपतीचे बुजगावणे उभे करून, आपल्या मोठेपणाचा, उदारपणाचा नि न्यायप्रियतेचा डांगोरा पिटून, सगळ्या थंड्या बंड्या मराठ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याची योजना करीत होते. बडेलाटानी सुचविलेल्या स्वराज्याच्या हद्दीची कल्पना बेलसर येथे ग्रांटने माहाराजांना दिलेली होतीच. पण अखेर फैसला पुन्हा कलकत्याहून मागवला होता, तिकडे प्रतापसिंह डोळे लाऊन बसला होता.
प्रतापसिंहाची हतबल अवस्था
या वेळी प्रतापसिंहाच्या आजूबाजूला निस्पृह सडेतोड मसलत सांगणारा आणि त्याचे प्रामाणिक मार्गदर्शन करणारा एकहि आसामी नव्हता. माईसाहेब बाईमाणूस! तिला गोर्या मुत्सद्यांच्या विलायती पाचपेचांचा अंदाज तो काय लागणार? विठ्ठलपंत महाजनी कंपनीच्या मेहरबानीने दिवाण झालेला म्हणून तो अंग्रेजांचा ओशाळा बळवंतराव मल्हार चिटणिसाचे बरेचसे वतन रावबाजीने खालसा केले होते. ग्रांट अलपिष्टनादिकांची मिनतवारी करून ते परत मिळविण्याच्या तो विवंचनेत अर्थात तोहि अंग्रेजांचा ओशाळाच.
मग आता उरले कोण? बळवंतराव भोसले सेनापति, नुसता नावाचा नि हुद्याचा पोरसवदा बच्चा तो. प्रतापसिंहापेक्षा पाच वर्षांनी लहान. अर्थात आंग्रेज करतील त्याला होकार देणें रास्त, यापेक्षा निराळा सल्ला कोण काय देणार? चतुरसिंग किंवा रंगो बापूजी असते, तर महाराजाना एखादी धाडसी मसलत सुचवून, ती पार पाडण्यासाठी त्यांच्यामागे ते ठासून उभे तरी राहिले असते. पण दोघेहि आंग्रेजी धोरणाने दूर झुगारले गेलेले, चतुरसिंगाला अलपिष्टनाने तुरुंगातच मरायला लावले आणि रंगो बापूजीला युक्तीने बाजूला काढून, नोकरीच्या तोबन्यात अडकवून दूरदेशी नेऊन ठेवले.
प्रकरण ८ वे
सोनेरी पिंजऱ्यात सातारचा सिंह
मुकाबला कुझत ठेऊन, चर्चा चिकित्सा वादविवाद आणि कमेट्या यांत कालपहरण करून प्रतिवादीला जेरीला आणायचे आंग्लाई तंत्र फार जुने आहे. समोरचा पक्ष कंटाळून वैतागला म्हणजे मग आपल्याला सोईस्कर असे वाटेल ते त्याच्याकडून लिहून कबूल करून घेता येते. रावबाजीप्रमाणेच प्रतापसिंहावर अलपिष्टनाने हाच प्रयोग केला. सातारच्या गादीवर त्याला आणून बसवले तरी स्वराज्याच्या हद्दी कोणत्या? छत्रपतिचे दोस्त का मांडलीक? मराठी साम्राज्याचे हिंदुपदपातशहा का इतर अनेक देशी संस्थानिकांप्रमाणेच एक छोटा संस्थानीक? इत्यादि कोणत्याहि मुद्याचा त्याने दीडवर्षभर प्रतापसिंहाला थांग लागू दिला नाही.
‘कलकत्याला लिहिले आहे, येईल थोड्याच दिवसांत खुलासा, काम फार महत्त्वाचे तेव्हा वेळ लागणारच’, अशा थापबाजीवर कालपहरण करण्याचे धोरण त्याने ठेवले. इकडे प्रांटाकडून रोजच्या रोज उपदेशाचे काटे, उत्तेजनाची रसायने आणि शिस्तीची कसरत चाललेली. प्रतापसिंह अगदी कंटाळून बेजार झाला. आमचा राज्याचा काय सोक्षमोक्ष लावायचा असेल तो एकदा लाऊन टाका, येथवर तो अगदी उठवणीला आला. या वेळी त्याचे वय २६ वर्षांचे होते. म्हणजे तो काही बोंडल्याने दूध पिणारा ‘बाल’ नव्हता. पण अंग्रेजानी आधीच ठरऊन टाकलेले का तो राजकारणात ‘अज्ञान’ म्हणून! काही वर्षे तरी आमच्या सरदाराच्या शिस्तबाज शिकवणीखाली त्याने राहिले पाहिजे.
छत्रपति महाराज म्हणून आपल्या वैभवाला साजेशोमेसा खर्च प्रतापसिंहाने केला का पंतोजी ग्रांट त्याला नाक मुरडीत असे. म्हणजे खानगीचा खर्चहि मनासारखा करायला त्याला मोकळीक मिळत नसे, पण माईसाहेब नि महाराज ग्रांटाच्या नाकमुरडणीला वरचेवर धाब्यावर बसवून आपल्याला योग्य दिसेल तो खर्च करीतच असत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आणि स्वतःकडे वाईटपणा येऊ नये म्हणून, ग्रांटने या बाबतीत वक्तशीर सूचना इषारे देण्याचे काम बाळाजीपंत नातूकडे सोपविले. मग काय? नातूचा भाव भलताच वधारला! त्याने महाराज नि माईसाहेब यांच्याशी रोजच्या रोज खटखटी चालू केल्या. नातू महाराजाशी बोलू लागला का माईसाहेब एकदम त्याच्यावर उसळायच्या. गंभीर चेहरा करून नातू हटकायचा.- ‘‘हे पहा माईसाहेब, मला तुमच्याशी काही एक बोलायचे नाही.
माझा दस्तुर महाराजाशी आपण मध्ये विनाकारण तोंड घालू नये. आपला माझा काही संबंध नाही. मी कंपनी सरकारचा नोकर, आज्ञेप्रमाणे कामे होताहेत का नाही, हे पहाणारा"
हरहमेष ही बाचाबाची चालायची. एका दिवशी तर कहर झाला. नातू भाईसाहेबांचा धडधडीत अपमान करायचा, टाकूनहि बोलायचा, ते सारे ग्रांटच्या पाठबळावर. नाहीतर त्या भटाच्या दोन सणसणीत थोतरीत लगाऊन त्याला हुसकवायला माईसाहेब कमी करणार्या नव्हत्या. प्रतापसिंहाच्या हाती त्याचे वाजवी अधिकार असते, तर त्याने नातूला अंधारकोठडीच दाखवली असती. पण त्याचा हात शिळेखाली सापडलेला.
माईसाहेब एकदा त्याला बेफामपणे हवे ते टाकून बोलल्या. नातूच्या कुकर्माचा नि बदकर्माचा पाढा तिने त्याच्या तोंडावर धडधडा बोलून दाखवला. पण नातू कसला बिलंदर टग्या! चेहर्यावर कसलाहि विकार न दर्शविता तो म्हणाला.- "माईसाहेब, या असल्या त्राग्याने काहीएक वळणार नाही. आम्ही जे काही करतो ते सारे महाराजांच्या कल्याणासाठीच. तुम्हाला त्यात काय समजणार?”
माईसाहेब.- मोठा आला मेला मला अक्कल शिकवायला. तुझ्यासारख्या दीडदमडीच्या भटाकडून असले शब्द ऐकण्यापेक्षा, भी सती जाते तरी बरे होते. मग असले हे अपमान करून घेण्याचे प्रसंग तरी आले नसते. वाटतं का या किल्ल्याच्या तटावरून उडी घ्यावी, नाही तर काशीवास पत्करावा.
नातू.- आत्महत्येपेक्षा काशीवास बरा. काशीला जायची इच्छा असेल, तर लिहातसे रसिदंडाला कंपनी सरकार तेव्हाच बंदोबस्त करतील.
खुद्द रावबाजीसुद्धा माईसाहेबाना फार वचकून असे. त्याने एकदाहि त्यांचा कधि अवमान केला नाही. रावबाजीविरुद्ध अंग्रेजांशी राजकारणे चालली होती, तेव्हा हाच नातू माईसाहेबाशी राजकारणाच्या मसलत करण्यासाठी मोठ्या मिनतवारीने समोर दूर बसायचा.
हरएक लहानमोठ्या बाबतीत त्यांच्या सल्याची याचना करायचा, पण आज? तोच कावळा अंग्रेजी हुद्याच्या प्रासादशिखरावर बसल्यामुळे, गरुडाच्या मिजाशीने त्याच राजमातेचा अवमान करायला धजावला! यानंतर माईसाहेब नातूला आपल्या समोर येऊच देईनाशा झाल्या. नातूला तेच पाहिजे होते. महाराज एकटे सापडल्यावर त्याना बनवायचे काम आता सोपे झाले.
हा घ्या तहनामा करा सही
ता. २२ सप्टेंबर १८१९ बुधवारी ग्रांटसाहेब महाराजांच्या भेटीला आला आणि त्याने कलकत्त्याहून बड्या लाटानी पसंत केलेला दहा कलमी तहनाम्याचा खर्डा महाराजांच्या हवाली केला. महाराजांच्या ठरावणीप्रमाणे ही कलमे आहेत, असे सांगून ग्रांट गेला. वाचून पाहिल्यावर प्रतापसिंहाला आश्चर्य वाटले. ग्रांट म्हणतात की तुम्ही ठरविली व सारे त्याप्रमाणे चालावे. ता. २४ गुरुवारी सकाळी नातू आला आणि म्हणाला. महाराज इंग्रेजानी जो तह ठरवला आहे. त्याला बेलाशक रुकार द्यावा. उगाच हंगल घालण्यात कल्याण नाही. पाठोपाठ ग्रांटहि आला. त्यानेहि तेच सांगितले.
दीड वर्षाच्या गोंधळा नंतर अखेर आलेला तह! प्रतापसिंहहि कातावलेला होता. त्याने म्हटले.- ‘कंपिणीसरकारातून तह ठरला तोच क्राईम.’ लगेच दुसऱ्या दिवशी ता. २५ सप्टेंबर १८१९ शनिवारी कंपनीच्या वतीने कॅपटन जेम्स ग्रांट आणि महाराजांच्या पतीने दिवाण विठ्ठल बळवंत महाजनी यांच्या सह्या होऊन, तहनामा कायम झाला.
"महाराजांचे हुकूम खावंद मुखत्यार आहे. परंतु जे करणे ते येथे कंपनी सरकारचे सरदार राहातील त्याचे मसलतीने केले म्हणजे तेहि महाराजांचा हुकूम मानूनच चालतील. येविसी काही दिवस महाराज जसे राज्य करितील तैसे महाराजाचे हाती देतील. पहिल्याने महाल मुलूक हातात येऊन, मग फौज ठेवून सारे जाहाले, म्हणजे घरचे मंडलीसुत्धा व चाकर सुत्या कमी करणे अथवा ठेवणे ते महाराज घालवितील व ठेवतील ते ठेवोत. परंतु जो सरदार राहील त्यास कळवून करावे." असे म्हणून ग्रांट वगैरे मंडळी सत्कार झाल्यावर निघून गेली.
तहाने पक्केच हातपाय जखडले
तहाचे पांचवे कलम तर इतके लवचीक नि सर्वव्यापी आहे की त्यामुळे महाराजाना कोणताहि व्यवहार करणे तर अशक्यच व्हावे, शिवाय त्यातल्या शब्दरचनेवर हवा त्याला हवा तो अर्थ बसवता यावा. शब्दरचनेच्या या मनस्वी लवचिकपणानेच पुढे प्रतापसिंहाच्या जीवनाचा कसा अनर्थ उडाला, हे पुढे आपल्याला दिसणारच आहे.
(राजकारणी खलित्यांची शब्दयोजना मोघम करून तिच्या अर्थात भुरळीचे धुके बेमालूम ठेवायचे आणि नंतर वाजवी अर्थ काय, त्याचे ‘इण्टरप्रिटेशन’ करण्यात समोरच्या मंडळीना चकवायचे, हा आंग्रेजी डिप्लोमसीचा रिवाज फार जुना आहे. चालू घडीच्या राजकारणात हाच देखावा दिसत आहे.)
तहातील हे पाचवे कलमच येथे देतो, म्हणजे महाराजांचे हातपाय या कलमाने कसे कलमछाट केले, ते वाचकाना समजून येईल.--
कलम पांचवे ५.–
“सरकार महाराज छत्रपति आपण व आपले फरजंद व वारीस व कायम मुकाम याचे तर्फेने करार करीत आहेत की या कराराप्रमाणे आपल्याकडील राज्यासिवाय दुसरे कोणी सरदार किंवा जाहगीरदार किंवा वकील वगैरे हरकोणास पत्र पाठविणार नाही व त्यांसी जाबसाल ठेवणार नाही. काही तक्रार पडल्यास त्याचा बंदोबस्त सरकार इंग्रेज बहादूर करतील. वर करार झाला आहे त्या मुलकांतील लोकांसी व बाहेरचे लोकांसी लग्नाचे किंवा घरगुती कांही कारण पडल्यास सरकार इंग्रेज बाहादूर यांचे सरदाराचे मार्फतीने करीत जातील.
याप्रमाणे करार करीत आहेत. हेंच कलम या तहनाम्याची शर्त आहे. याजकरितां सरकार महाराज छत्रपति आपण व फरजंद व वारीस व कायममुकाम या गोष्टीवर हमेशा नजर ठेवितील. महाराज यांचे सरकारांतून काही तफावत पडल्यास या तहनाम्याचे रुईने महाराज यांचे सरकारास जो फाईदा आहे तो बरबाद होईल. कलम.”
कोणत्याहि बाबतीत कोणाशीहि कसलाहि पत्रव्यवहार करायचा नाही, करायचाच तर तो अंग्रेजांच्या सरदारांच्या (रसिदंटांच्या) कचेरीमार्फतच केला पाहिजे.दसर्याचे पोषाख, तिळगूळ, सणवार, श्राद्धपक्ष वगैरे शेकडो गोष्टीसुद्धा दर वेळेला आंग्रेजी सरदरांच्या मार्फत जाहीर रीतीने उलगडून घ्यायची बळजबरी म्हणजे बाटलीवरची कसरतच झाली ती.
शिवाय, यात जरा चूक झाली का तहनामा मोडल्याचे घोर पाप! सुरुवातीचे रसिदंट जरा समजूतदार होते तोंवर या कलमाविषयी फारशी कोणी कदरबाजी दाखविली नाही. पण नंतर ओव्हन्ससारर मगरूर रसिदंट येताच, याच कलमाचा फास त्यानी प्रतापसिंहाच्या मानेला लाऊन त्याचा कांटा काढला.
दुसर्या कलमातल्या "सरकार इंग्रेज बाहादूर यांचे सरकारातून जे राज्य देत आहे तें घेऊन सरकार इंग्रेज बहादूर याचे कह्यात व मदतीत (मूळ इंग्रजी शब्द In subordinate co-operation किती फसवेगिरीचे आहेत ते पहा. ताबेदारीचा सहकार किंवा सहकाराची ताबेदारी काय वाटेल तो अर्थ बसवून अनर्थाची सोय केलेली होती. तसेच पुढे अनुभवाला आले.)
निरंतर संतोषाने राहून सरकार इंग्रेज बहादूर यांचे सलामसलतीने हरयेक काम करीत जाऊ’’ या अटीने तर हिंदुपदपातशाहीच्या स्वतंत्र स्वराज्याच्या प्रतापसिंहाच्या आशेच्या चिंधड्याच उडाल्या. कंपनी सरकारच्या पंजाखालचा तो एक मांडलीक संस्थानीकच झाला. ‘‘महाराजाचे मनात येत असेल की हे राज्य आम्हास देत नाहीत. नाव मात्र चालू आहे. असे नाही. महाराज वाकब (वाकब झाला म्हणजे तुमच्या देशाचे राज्य तुमचेच आहे. मग आम्ही एक घटकाभर सुद्धा येथे रहाणार नाही. ही आग्रेजाची भाषा फार जुनी आहे. आम्हाला वाकबगारी शिकवणारे पंतोजी हेच आणि परिक्षा घेणारे पंडितहि तेच. दीडशे वर्षे चाललेली ही हेंगलबाजी अखेर महात्मा गांधींना ‘चलो. भारत छोड़ो’च्या आरोळीने थंड पाडावी लागली.) जाले म्हणजे आमची मगदूर नाही. सारे महाराजाचे आहे." असे ग्रांट प्रतापसिंहाला वरचेवर सांगून त्याला धीर देत असे.
दसर्याला ग्रांटचा सत्कार
तहनाम्याने आपल्याला कल्पनेपेक्षा फारच कमी प्रदेश मिळाला, याचे महाराजांना वैषम्य वाटणे साहजीक होते. तथापि वडील भावाच्या प्रेमाने ग्रांट आपल्याला अनेक नवनव्या गोष्टी शिकवीत आहे. राज्यकारभाराच्या बारीकसारीक मुद्यांत इंग्रेजी धर्तीची शिस्त लावीत आहे आणि एकंदर विचार आचाराला विलायती वळण लावीत आहे. त्याचा पुरा फायदा घेऊन आपण हाती आलेल्या छोटेखानी स्वराज्यातसुद्धा अकलेची करामत करून दाखऊ, अशा उत्स्फूर्त भावनेने, प्रतापसिंहाने पुढे पाऊल टाकण्याचा निश्चय केला. तहनामा झाल्यावर अवघ्या तीनच दिवसानी दसऱ्याचा सण आला.
तेव्हा, विशेष काही झालेच नाही, अशा मोकळ्या मनोवृत्तीने ‘‘सिलंगणास स्वारी गेली. इंग्रेजाकडील पलटणे पायदल याची फयर जाली. नंतर स्वारी वाड्यात आली. सर्वांचे नजरनजराणे जाले सोने सांप्रदायप्रमाणे देऊन नंतर (रेसिडेन्सीतले कारकून) अन्याबा चितले व तात्या अभ्यंकर व कृष्णराव यास साडेतीन सनगे देऊन, ग्रांटांचे हवाली रुपयाची दऊत व नवे मोर्तब दिले.’’ ग्रांटवर प्रतापसिंहाचे प्रेम चांगलेच बसण्याचे कारण, त्याने त्याच्याशी अधिकाराचा दिमाख शक्य तितका दाखविला नाही. गैरसमजाने किंवा कशानेहि मन उद्विग्न झालं तर प्रतापसिंह लगेच ग्रांटला भेटत असे आणि तोहि त्याला कळवल्याने मुद्देसूद खुलासा देऊन त्याची वृत्ति ठिकाणावर आणीत असे. तहनाम्यातील शर्तीना न दुखवताहि स्वतंत्रपणे महाराजाना स्वराज्याचा कारभार उत्कृष्ट कसा करता येईल, न्यायमनसुब्याची कामे झटपट उरकून रयतेला सुख कसे देता येईल. इत्यादि अनेक उपदेश ग्रांट करीत असल्यामुळे, दोघांची पाठच्या भावाप्रमाणे दोस्ती जमली.
छत्रपतीच्या सैन्याची नेमणूक
१८ ऑक्टोबर १८१९ रोजी सोमवारी ग्रांट भेटीला आला, तेव्हा १०० पायदळ शिपायी. १ जमादार २ दफेदार १ कारकून २ भालदार, दोन निशाणे, अंशी छत्रपतींच्या खानगी सैन्याची व्यवस्था ठरली. मात्र “माईसाहेब व भाऊसाहेब व आपासाहेब याणी पाईचे लोक ठेऊ नयेत, ज्याप्रमाणे स्वार स्वारीचे वेळेस लागतीलते वेळेस देणे.” राजधानीच्या रक्षणासाठी कंपनीचा रिसाला आणून ठेवलेलाच होता.
कंपनीच्या रिसाल्यातले गोरे लोक सातारा शहरात वरचेवर यायचे आणि लोकाना दमघाटी करायचे, छड्या मारायचे, कुणबिनींच्या मागे लागायचे, शहरातल्या कलावंतिणीची रस्त्यावरून थट्टा मस्करी करायचे वगैरे प्रकार नेहमी व्हायचे. प्रथम प्रथम महाराज तिकडे लक्ष्य देत नसत. पण हे प्रकार फार वाढल्यावर ग्रांटच्या कानावर ते घालून, पक्का बंदोबस्त करवला. कॅम्पात गोवध व्हायचा, तो थांबविण्यासाठी एकदा एका वैराग्याने वैताग केला. महाराजांना ते समजताच खंडू शिंद्याच्या बरोबर लिटल साहेबाला सागून पाठविले की ‘येथे गाई मारणे नाही. कंपनी सरकारचा हुकूम आहे. (गोमांस) लागले तरी बाहेरून आणावे.’ ग्रांटनेहि हुकूम सोडला की ‘जो (गाय) मारील त्यास धरून आणावा म्हणजे पारिपत्य करू.’
‘राज्यकारभारात महाराज वाकबगार झाले म्हणजे त्याना सर्वाधिकार देण्यात येतील.` या ग्रांटच्या आश्वासनावर विसंबून प्रतापसिंहाने ग्रांटच्या अनुमतीने आपल्या कारभाराची सुधारणा करण्याचा निश्चय केला.
अलपिष्टनाची संभावीत हरामखोरी.
रंगो बापूजी नि चिटणीस यानी प्रथम अलपिष्टनाशी मसलतीचे बोलणे केले तेव्हा आणि त्यानंतर नरसू काकड्याशी अनेक वेळा “आहे ते मराठी साम्राज्य महाराजांचेच आहे. सारी रयत महाराजांच्या मागेच जाणार, महाराजच सगळ्यांचे धनी, यांत शंकाच नाही. सिंहासनाचे अधिपति छत्रपति सरकारच”. ही कबुली शपथेवर अलपिष्टनाने केली आणि अष्ट्याच्या समरांगणावर जनरल स्मिथने आरोळ्या ठोकून जनजाहीर केली. पण अखेर महाराजांच्या हातात काय ठेवले? तर चौदा पेट्यांचे चिमुकले संस्थान! शिवाय दक्षिणेतल्या छत्रपतिनिर्मित जहागिरदारांचा प्रश्न बांध्यात ठेवला तो ठेवलाच. हा सर्व प्रकार बळवंतराव मल्हारच्या एका लांबलचक कैफियतीने (आणि डॉ. मिल्नच्या इंग्रजी भाषांतराने) येथे नि विलायतेत तमाम हिंदी अंग्रेजी लोकांपुढे मांडला, त्या वेळी अलपिष्टन हयात होता.
पण त्यातली विधाने खोटी पाडायची त्याला हिंमत झाली नाही. एरवी नाकावर माशी बसू न देणारा अलपिष्टन, बळवंतराव चिटणीसाने त्याला लेखी कैफीयतीने वचनभ्रष्ट, खोट्या शपथा देणारा, असा म्हणताच, तो स्वस्थ बसला असता काय? पण बाजू आंगावर आली का तोंड मिटून स्वस्थ बसायचे, ही कला आंग्रेज मुत्सद्यांचा तर ठरावीक ट्रेडमार्क. मनात एक, सांगायचे एक आणि अखेर करायचे निराळेच, ही आंग्रेजी दगलबाजीची (डिप्लोमसीची) मक्खी तत्कालीन साध्याभोळया मराठी राजाला नि त्याच्या मुत्सद्याना कशाने उमगणार? आजहि एवढा मोठा ‘भारत छोडो`चा धिंगाणा घालणारे आमचे हिंदी मुत्सद्दी! पण त्यांनाही याच भुलभुलावणीने आंग्रेजलोक खेळवीत आहेतच ना?
प्रकरण ९ वे
प्रतापसिंहाच्या प्रतापाने साताऱ्याचे नंदनवन झाले
"शिवाजी महाराजानी तरवार केली. बहुत थोर नाव जाले. आपण आकलेनी थोर नाव करावे. मेहनत फार फार करावी. राज्य आलेवरी होणार नाही. थोडे दिवस उरले. मेहनत फार फार करावी. फडणीस चिटणीस मर्जीजोग बोलतील. स्पष्ट बोलणार नाहीत. महाराजानी मनात आणून वागावे”.
-ग्रांटचा प्रतापसिंहाला उपदेश, ता. ११-८-१८१९.
बनिया गुंफणीच्या गोर्या मुत्सद्यानी प्रतापसिंहाला जाळ्यात अडकऊन त्याच्यावाजवी हक्कांची कितीहि छाटाछाट केली असली, तरी रसिदंट ग्रांट याने त्याला रोजच्या रोज उत्तेजन द्यावे, राज्यव्यवहाराच्या नवनव्या योजना सांगाव्या, जुन्या मराठशाही ऐदीपणाचा बडेजाव आणि आंग्रेजी कारभाराची कदरबाज शिस्त यांतला भेद पटवावा आणि सर्व बाजूनी त्याचे राज्य नमुनेदार कसे होईल, याची काळजी वहावी. प्रतापसिंह जात्याच प्रागतिक पिंडाचा असल्यामुळे, तो ग्रांटाच्या सल्ल्याप्रमाणे भराभर आपल्या राज्यात प्रजेच्या हिताच्या अनेक सुधारणा करू लागला. ग्रांटने त्याला शिकारीचा नाद लावला. दोघेहि वरचेवर जंगलात जाऊन शिकार करायचे.
खासगी आणि लोकहिताची कामे वेळच्या वेळी करण्याचे तर प्रतापसिंहाला त्याने व्यसनच लावले. कारभार नि न्याय इन्साफ उघडपणे कचेरीत येऊन तो करू लागला. अगोदर निश्चित कार्यक्रम ठरवून त्याप्रमाणे प्रांतांत फिरायचे, रयतेच्या सुखदुल्यांची चौकशी करायची. पिकांची पहाणी करायची, वगैरे कामे ग्रांट स्वतः त्याच्याबरोबर जाऊन त्याला शिकवू लागला. ग्रांटचा बंगला राजवाड्याशेजारीच असल्यामुळे, दोघेजण हरएक बाबतीत सख्ख्या बंधूप्रमाणे एकमेकाशी रात्रंदिवस विचारविनिमय करीत असत. याचा परिणाम थोड्याच वर्षात प्रतापसिंहाने सातारा राज्याचे नंदनवन कसे बनवले. हेच या प्रकरणात पहायचे आहे.
शेडगांवकर बखर म्हणते- "प्रतापसिंहाची बुद्धि फार विशाल असोन ते बोलके उत्तम प्रकारचे होते. धूर्तता चांगली होती. घोडयावर बसणे व शिपाईगिरीत शूर व सर्व गुण जाणते व सर्व विद्याप्रवीण होते. अंतःकरण निर्मळ असोन पदरचे लोकांचा अभिमान फार होता. इन्साफाचे काम वक्तशीर करोन, जातीचे अकलेने राज्यकारभार सुव्यवस्थित चालविला. अपराधी शरण आल्यावर क्षमेविषयी औदार्य फार होते. त्याने स्वारं सिबंदी व कामगार वगैरेचा पगार वेळेवर देऊन व रयत सुखी राखोन लोक हुशार ठेविले. स्नानसंध्या पूजादि नित्य नेम व सुकर्मे करण्याची आवड व कुळस्वामीवर भक्ति होती. पुरातन नोकर गरीबीत आले होते त्यांचे उर्जित केले."
शहर सुधारणा- थोरले शाहू सारखे मोठे दीर्घजीवी छत्रपति सातारला झाले, पण एकाच्याहि मनात शहरसुधारणेचा प्रश्न कधि आला नाही. राजधानीचे ठिकाण, पण पाण्याची नेहमीच ओरड. प्रतापसिंहाने येवतेश्वराचे देवालयाचे पिछाडीला एक मोठा सुंदर तलाव बांधून, त्यातले पाणी नळाने शहरात आणले. महारदरा येथेहि एक तलाव बांधून खापरी नळाने त्याचे पाणी शहरात खेळविले. (सन १८२९) या कामी एक लाख रुपये खर्च आला.
सातारा शहराचे हमरस्ते सरळ नि आखीव तयार केले, साडेपाच लाख रुपये खर्च करून मोठा राजवाडा बांधला. (१८२६). रस्त्यांच्या दोही बाजूला झाडे लाऊन, शिवाय स्वतः काही वाडे बांधले, इतराना बांधण्यासाठी पैशांची मदत केली. पेठकरी लोकाना दुकाने बांधण्यासाठी तगाई रकमा दिल्या. नागरिकांच्या मुलामुलीना संस्कृत मराठी नि इंग्लिश शिकण्यासाठी एक मोठी पाठशाळेची इमारत बांधली. तेथेच बारा हजार रुपये खर्च करून महाराजानी एक छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ छापविले. सन १८२२ साली जंजिरे मुंबईस हाली छापखान्यात महाराष्ट्र भाषेत पंचोपाख्यान बालबोध लिपीत, यंत्रे करून, बुके वाचावयास तयार केली. त्या पुस्तकाची एक प्रत अलपिष्टनाने प्रतापसिंहाकडे पाठवतांच, त्यानेहि तो उद्योग सातार्यात चालू केला. शहरात नि आजूबाजूला दरबान्यांसाठी अनेक मोठमोठे वाडे बांधले. देवालयांसाठीहि लाखो रुपये खर्च करून त्यांचा जीर्णोद्धार केला. किल्ल्यावरील मंगळाईचे देऊळ रु. ५००० प्रतापगडचे भवानीचे देवालय रु ४०,०००, सज्जनगडचे रामदास स्वामीचे देऊळ रु. २०,०००, येवतेश्वराचे देऊळ व तलाव रु. १०,००० लोकांच्या उपयोगासाठी शहरात पंचपाळा हौद, गुरुवारचा हौद, छत्रीचा हौद, वगैरे अनेक हौद बांधले. सारांश, थोड्याच वर्षांच्या अवधीत प्रतापसिंहाने आपली सातारा राजधानी नवनव्या लोकोपयोगी सुधारणानी अशी नटवून सोडली का त्या पुढे पेशव्यांचे पुणे फिके पडले. उद्योग धंदा व्यापार नि कारागिरी यानाहि वक्तशीर राजाश्रय मिळत गेल्यामुळे, सातारा राजधानीला एक नवीनच तेजाळ वैभव आले. जो उठला तो सातार्याला धावू लागला.
शिक्षणविषयक सुधारणा- प्रतापसिंहाने पाठशाळा बांधली आणि आपल्या जातीच्या मराठे मुलाना, इतरांच्या मुलांबरोबरच, शिक्षण घेण्यासाठी जाण्याची शिफारस केली. पाठशाळेत मराठ्यांची पोरे शिकू लागली. आणि तेहि संस्कृत मराठी नि इंग्लिश, तर मग आम्हा भटाबामणांचा भाव तो काय राहिला? या सबबीवर ब्राम्हण शिक्षकानी त्या मुलाना शिकवायचा स्पष्ट नकार दिला. शूद्राना विद्या शिकवू नये, हा पडला मनुस्मृतीचा दण्डक! महाराजानी त्यांची समजूत घालण्याचा पुष्कळ यत्न केला, पण ब्राम्हणांची मनोवृत्ति म्हणजे कुत्र्याचे शेपूट! सदानकदा वाकडेच! जगात त्याना सरळ कोठे काही दिसायचे नाही. अखेर महाराजानी मुंबईच्या डॉ. मिल्नला पत्र पाठवून त्याच्या मार्फत दोनतीन विद्वान मिशनरी आणवले, जोडीला आवा पारसनीस यांस देऊन ती पाठशाळा जोरात चालविली. ‘मराठ्यास सिकवतो, तेव्हा फसलो.’ असे माधवराव नावाच्या ब्राम्हण शिक्षकास वाटले. त्यावर महाराज आपल्या डायरीत लिहितात.- “आमी आसे मनी दावा येईलसे नोव्हतो. परंतु आसी ब्राम्हण चाल. आमचे ज्ञातीविसी साहेब लोक यासी लगत आमची नसावी, हेहि मन फार ब्राम्हण लोकांचे.” प्रतापसिंहाच्या मामानी (शिवर्यानी) आपली मुलगी मुलांच्या बरोबर शिकण्यासाठी पाठशाळेत पाठवली. यावर प्रतापसिंहाचे मत असे होते की, मुलीना शिक्षण अगत्य द्यावे. पण मुलांच्या बरोबर शाळेत पाठवू नये, तर घरच्या घरी शिक्षक ठेऊन द्यावे. मुलांमुलींचे सहशिक्षण असावे का नसावे, या मुद्यावर आजहि वाद आहेत, तर त्या काळी प्रतापसिंहाने मुलींच्या स्वतंत्र शिक्षणाचा आग्रह धरल्यास त्यात फारसे वावगे काहीच नव्हते. मराठ्यांच्या मुलांनी शिकावे का न शिकावे, हाच मुळी जेथे वादविवादाचा नि शंका कुशंकेचा प्रश्न, तेथे घडाड पाठशाळा घालून, तमाम शहरातली नि सोयर्याधायर्यांची मुलें तेथे शिकायला पाठवायचा महाराजाचा आग्रह, हेच केवढे अपूर्व प्रागतिकपणाचे होते.
ग्रंथरचना नि प्रकाशन- ग्रांटच्या सहवासाने युरप इंग्लंडमधील सर्व दर्ज्याचे लोक शिक्षणप्रसाराने कसे प्रबुद्ध चौकस आणि सुधारक बनले होते. हे महाराजानी बिनचूक हेरुनच प्रथम शिक्षणप्रसाराच्या कार्याला हात घातला. मूठभर आंग्रेज लोक या देशात येतात काय, व्यापार करतात काय आणि थोड्याच वर्षात ठिकठिकाणची आमची राज्ये बळकावतात काय! यांचे सामर्थ्य कशात आहे? हे इकडील लोकाना पुरेपूर उमजण्यासाठी, तिकडील अनेक उपयुक्त इंग्लिश ग्रंथांचे मराठी भाषांतर करून ती पुस्तके त्यांच्या हातात पडली पाहिजेत, हे तर प्रतापसिंहाने शोधून काढले. त्याने माधवराव मुनशी याचेकडून सभारंजनी नावाचा एक ग्रंथ लिहविला. (पुढे तो भारतवर्ष मासिकात छापला गेला.) या पुस्तकाच्या प्रस्तावनेचा थोडासा नमुना मुद्दाम येथे देतो. त्यावरून त्या काळच्या मन्हाठी भाषेची घडण वाचकाना समजेल :
"श्रीमत् जगदीश्वराप्रती नमन करून ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ करंतों कीं, पूर्वी हा ग्रंथ साहेब आलीषान मिस्तर इरन गटन साहेब बहादूर याणी शेर अल्ली मुनशी याजकडून उर्दू भाषेत करवून याचें नांव आरायेष महफील असें ठेवून सन १८०४ या सालांत छापखान्यांत देऊन छापविला. परंतु जे लोक पारशी विद्येत प्रवीण नाहीत त्यांचे समजूतीत येत नाहीं. याकरितां प्रवृत्तीचे मराठी भाषेत तरजूमा केला असतां इकडील सर्व लोकांचे समजूतींत चांगला येईल म्हणोन श्रीमन्महाराज क्षत्रिय कुलावंतस राजश्री छत्रपती स्वामी प्रतापसिंहमहाराज याणी आज्ञा केल्यावरून इचें नाव सभारंजनी असें ठेविलें आहे."
सभारंजनी अंदाजे १०६ पानांचे पुस्तक आहे. सन १८२७ साली महाराजानी राजनीतिविषयक सभानीति नावाचा एक ग्रंथ लिहऊन छापला. शिवाय, आय-व्यय प्रकरण आणि सेवक-बोधिनी नावांचे आणखी दोन ग्रंथ लिहऊन छापले. `एवढ्यावरून प्रतापसिंहाची राजकारणी अभिरुची आणि लोकहितवादाची तळमळ केवढी दांडगी होती, हे स्पष्ट होते. या शिवाय तत्कालीन संस्कृत फारशीचे पंडित नि प्राध्यापक आबा पारसनीस यांच्याकडून महाराजानी सिद्धांत विजय नावाचा एक प्रचंड संस्कृत ग्रंथ लिहवून घेतला. त्यात जुन्या कर्मठ ब्राम्हणी धर्मावर शास्त्राधारे यशस्वी हल्ला चढविला असून यांचे अस्तित्व सिद्ध केले आहे. हा ग्रंथ शाहू महाराज करवीर छत्रपति यानी के प्रोफेसर महादेव गणेश डोंगरे, बी. एससी, एल्सीई यांचेकडून मराठीत भाषांतर करवून कोल्हापूर मिशन प्रेसमध्ये छापवून सन १९०६ साली प्रसिद्ध करविला.
प्रतापसिंहाने या ग्रंथाचे पांच अध्याय सातारा येथे शिळाछापावर छापवून घेतले होते. बाकीचे पांच सरकारी दप्तरांत हस्तलिखित सापडले. मात्र १० वा अध्याय मिळाला नाही. नऊच मिळाले. तेवढे आता उपलब्ध आहेत. याशिवाय, कर्मकल्पद्रुम, रस तरंगिणी, छंदोमंजरी (काव्य) असे अनेक ग्रंथ प्रतापसिंहाने लिहवून घेतले नि छापले. छंदोमंजरी हा काव्यात्मक ग्रंथ छत्रपतीचे आश्रित बेलवडे येथील रामचंद्र दैवज्ञ ज्योतिषी याने १८२७ त तयार केला. त्याबद्दल त्याला बेलवडे येथे दोन चाहूर जमीन वंशपरंपरा इनाम दिलेली आहे. सन १८२० साली अथानंदकृत चित्पावन भाग्योदय दीपिका नावाचे दोन अध्यायाचे पुराणवजा काव्यहि `आनंद` नामक एका कवीने तयार केले, ते १८७५ त ‘सद्बोध चिंतामणि’ नावाच्या पुस्तकात छापलेले मला आढळले. ते प्रबोधन वर्ष ५ थे, अंक ५ या फेब्रुवारी १९२७ यात मी समग्र छापले आहे. शेवटच्या २ र्या अध्यायाच्या अखेर हा आनंद कवि लिहितो.
आनंद विनवी श्रोतया जना प्राकृत भाषा जाणोनि मना।
उपेक्षा करण्याची कल्पना चित्ती स्वल्प ना वागविजे ।। १३२ ।।
ही चित्पावन भाग्योदय दीपिका महाराष्ट्र भाषें शुभ बोधिका ।
ग्रंथोनि कथिला अन्वय निका जैसा पिका ये सकलाम्रतरू ।। १३३ ।।
शालीवाहन सत्राशत बेचाळिसाचे शकाकांत ।
विक्रम नाम संवत्सरांत हे सातारियांत पूर्ण केले ।। १३४ ।।
मराठे तरुण तरुणीला लष्करी शिक्षण -
भटाबामणांची मते काहीहि असली तरी आम्ही मराठे क्षत्रिय आहोत. क्षात्र पराक्रमानेच शिवाजीने हिंदवी स्वराज्य निर्माण केले. पिढ्यानपिढ्या हा आमचा क्षात्रधर्म अखंड चालत आला आहे, तेव्हा यच्चावत मराठे तरुणानी आणि तरुणीनीसुद्धा लष्करी शिक्षण घेतलेच पाहिजे, या हेतूने महाराजानी ग्राण्टच्या सल्ल्याने रेसिडेन्सीतला एक गोरा लष्करी हापसर नेमला. आपली मुलगी गोजराबाई हिला इतर काही सरदारदरबान्यांच्या मुलींबरोबर लष्करी शिक्षण महाराज देऊ लागले. नुसत्या शालेय शिक्षणाला मुली पाठवल्या तर केवढा गहजब! आणि आता तर त्या मुलीना एक गोरा हापसर रोजच्या रोज घोड्यावरच्या रपेटी, भालाफेकी, बंदूकमारी असले शिक्षण देऊ लागल्यावर सनातनी पिंडाच्या बामण बामणेतरांत एकच बुरखेबाज आकांत उडाला! पण महाराजानी तिकडे लक्षच दिले नाही.
प्रतापसिंहाला सर्वाधिकार
थोडयाच वर्षांत प्रतापसिंहाने राज्यकर्तृत्वाची आणि लोकहितवादाची दाखविलेली चमक पाहून ग्राण्ट फार संतुष्ट झाला. त्याने वरचेवर मुंबई सरकारात या प्रगमनशील तरुण महाराजाच्या कर्तबगारीची मुक्तकष्ठाने स्तुति केली. विलायतेस कंपनीच्या डायरेक्टर बोर्डापर्यन्त प्रतापसिंहाची कीर्ति गेली. सारी रयत तर त्याला परमेश्वर मानून त्याचे पोवाडे गाऊ लागली. छत्रपतीच्या राज्यात जेवढ्या सुधारणा झाल्या. तेवढया आपल्या सत्तेखाली असलेल्या महाराष्ट्रातहि आपल्याला साधल्या नाहीत, हे मुंबईच्या गवर्नरला खुद एलफिन्स्टनला स्पष्ट दिसून आले. म्हणून ५ एप्रिल १८२२ शुक्रवारी, ग्राण्टने प्रतापसिंह छत्रपतीला सर्वाधिकार देण्याचा मोठा दरबार भरविला. कलकत्त्याचा गवर्नर जनरल लॉर्ड हेस्टिंग्ज आणि मुंबईचा गवर्नर एलफिन्स्टन यांचेकडून आलेले अधिकारदानाचे खलिते वाचण्यात आले आणि ग्राण्टने महाराजांच्या अष्टपैलू कर्तृत्वाची मोठ्या अभिमानाने वाखाणणी करून नवा जाहीरनामा सर्वत्र पुकारला. रयतेने मोठा उत्सव केला.
“हु!"
जाहीरनामा सरकार दौलतमदार कंपनी इंग्रेज बहादूर तमाम लोकांस महशूर व्हावयाकरिता लिहिले जाते जे- सरकार श्रीमंत माहाराज छत्रपतिसाहेब राजे सातारा यांसी कंपनी सरकारातून राज्य देऊन तहनामा जाहाला. त्या वेलेस असे ठरले होते की मुलकाचे आबादी व बंदोबस्ताकरिता व महाराज व त्याचे अहलकर (कारकून) लोक बंदोबस्ताचे कामास वाकर व्हावयाकरिता काही दिवस मुलकाची वहिवाट महाराज यांचे मसलतीने इंग्रजी सरकारचे सरदार करितील. यास हाली महाराजाचे सरकारातून दरोबस्त वहिवाट आजपासून होत जावी असे ठरले. त्यावरून उलियम चापलीन साहेब कमिशनर बाहादूर याणी सातारेयास येऊन माहाराजचे दरबारात मोठे सरदार व जाहगीरदार वगैरे सारे लोक जमा होऊन राज्याची वहिवाट महाराज याचे सरकारात सुपूर्द केली असे. तरी सरदार व जाहागीरदार लहान मोठे जे माहराजाचे इलाख्यात आहेत, त्याणी व तमाम रयत वगैरे हरयेक लोकानी, महाराज यांचे सरकारचे लक्ष ठेवून त्यांचे हुकमात वागत असावे. मोठे सरदार व जहागीरदार याणी आपलाले यादीप्रमाणे वागावे, महाराजाचे सरकारातूनहि या लोकास हुकूम देते वेलेस यादीप्रमाणे देत जातील. सर्वांनी जाहीरनामा समजोन वागत आसावे. जाणीजे, तारीख ५ येप्रिल सन १८२२ इसवी मु। छ १२ रजब सु। इसने आशरीन मयातेन व अलफ. (पे. द. ४२ पा. ४९).
याच सुमारास लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने प्रतापसिंहाला आपल्या सभासदत्वाचा सन्मान दिला. लवकरच ३१ दिसेम्बर १८२२ ला ग्रांटडफ गेला नि त्याच्या जागी कर्नल ग्रिग्ज रेसिदंट म्हणून आला.
पुढील हकिकती नीट समजण्यासाठी प्रतापसिंहाच्या कारकीर्दीत कोण कोण रेसिदंट आले, मुंबईला कोणकोण गवर्नर होते आणि कलकत्याला गवर्नर जनरल कोणकोण होते. याचा तक्ता वाचकांसमोर असणे अगत्याचे असल्यामुळे, तो आधी पुढे दिला आहे.
प्रकरण १० वे
प्रतापसिंहाचा सर्वत्र जयजयकार
कौटुंबिक घडामोडी
प्रतापसिंहाचा पाठीवरचा धाकटा भाऊ रामचंद्र ऊर्फ भाऊसाहेब २१ जानेवारी सन १८२१ रोजी वारला. मरणसमयीं त्याचे वय अवघे २६ वर्षांचे होते. पुढल्याच वर्षी ता. ३-१-१८२२ रोजी मातोश्री आनंदीबाई ऊर्फ माईसाहेब तुळजापूरच्या यात्रेहून परत येत असता, भीमातीरी धुळखेड येथे मरण पावल्या. मरणापूर्वी आपल्या राजपुत्राला सर्वाधिकार मिळाल्याचे समाधान तेवढे त्यांच्या पदरात पडले.
या वेळी कनिष्ट बंधू आप्पासाहेब भोसला १७ वर्षांचा होता. लहानपणापासूनच हा पक्का उनाडटप्पू निघाला. याच्याविषयी ग्रांट डफने लिहून ठेवले होते की आप्पासाहेब हा ‘हट्टी नि दुराचरणी आहे. त्याला वाईट वाईट व्यसने लागलेली आहेत. प्रतापसिंहाने त्याला ताळ्यावर आणण्याचे शिकस्तीचे प्रयत्न केले, पण त्याच्या वाईट खोड्या नि व्यसने सुटत नाहीत` मोठमोठे कंपनीचे अधिकारी जहागीरदार साताऱ्याला आले म्हणजे या व्रात्य तरुणाचे चाळे नि बदलौकीक ऐकून पाहून खेद करायचे. कंपनीचे अधिकारी वरचेवर मुंबई सरकारात आप्पासाहेबाचे हलकट धंदे लिहून कळवायचे, पण योगायोग काय पहा, की अखेर त्याच मुंबई सरकारने पुढे सज्जन प्रतापसिंहाचा कांटा काढण्यासाठी, सातारच्या गादीवर याच दुर्जन आप्पाला बसविण्याची पिसाडघाई केली.
ग्रांट डफचा जिव्हाळा
थोड्या अवधीत प्रतापसिंहाने राज्यसुधारणेचा जो कौतुकास्पद आटोप केला, त्याचे सारे श्रेय ग्रांट डफला देणे वाजवी आहे. सन १८२२ अखेर तो स्कॉटलंडात ईडन येथे गेला, तरी नेहमी राजकारण प्रकरणी आणि खुद्द महाराजाच्या सर्वांगीण प्रगतीबद्दल लांबलचक स्नेहाळपणाची पत्रे पाठवून चौकशी करीत असे. त्या पत्रांतील दोनतीन त्रोटक वेंचे पहा, म्हणजे ग्रांटच्या विशुद्ध भावनांची खात्री पटेल.
(१) सातारियाचे बरे व्हावे म्हणोन जी मेहनत मी घेतली ती मेहनत असी की माझा खासगत सातारा असता तरी इतकी घेतली नसती.
(२) आपली सुकीर्ति व उत्तम नामना मेळविली आहे, श्रवण करून मला संतोष वाटला तो पत्रीं दर्शविता येत नाही. ज्या गोष्टी अलिकडेस माझ्या श्रवणी आल्या आहेत तेणेकरून तर फारच हर्ष जाहाला.
(३) सातारा देश माझा खासगत असता तर इतके अगत्ये केले नसते, परंतु आपले देशार्थ सर्वकाळ हित व्हावे म्हणोन इतके लिहिले आहे.
(४) (इंग्रेजीत स्पेलिंग करून लिहिलेले हिंदी) महाराजकू कबु तखतपर कबु खलबतखानमे कब कहा हम दोस्ती से कबु दो बातकी सलामी बोलते थे, कबु दस बात चूप आपनी गपसप बी बोलतेथे. आदत से अलबत लिखने चाहिये. लेकिन महाराज मालूम है के खुशामतकी बात मेरा दस्तूर नहीं.
(५) कबु महाराजका घुसा बी मेरे उपर बहुत हुवा होयगा, लेकिन महाराजने आपने दिलकूपूछना की किस्के करनेसे अच्छा हुवा?
स्कॉटलंडमधील ईडन येथे वास्तव्य असताना ग्रांटने आपला ‘मराठ्यांचा इतिहास’ इंग्रजीत लिहून तयार केला. तो प्रचण्ड इतिहास छापायला खर्चहि प्रचण्डच, तेव्हा त्याने कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाला अर्ज दिला की या महत्वाच्या ग्रंथाच्या छपाईसाठी रकम मंजूर करावी. बोर्डातल्या मंडळींनी आधी तो वाचून पाहण्यातच बराच काळ घालविला. अखेर जबाब दिला की या ग्रंथाला ‘मराठ्यांचा इतिहास’ असे नांव न देता, ‘आंग्रेज कुंफणी बहादुर यांच्या भारतीय राज्यसत्तेचा पाया’ असे नाव दिल्यास खर्चाची मंजुरी मिळेल. ग्रांटने स्पष्ट नकार दिला. छापीन तर मूळ ठरविलेल्या मूळ नावानेच, नाहीतर फाडून टाकीन. पुढे हे प्रकरण तिकडे लोकांत बरेच गाजले.
काही श्रीमंत नि भारतप्रेमी इंग्रेज गृहस्थानी ग्रांटला पैशाची मदत केली नि तो ग्रंथ बोर्डाच्या नाकावर टिच्चून बाहेर पडला. पुढे केपन नावाच्या एका इंग्रेज इसमाने त्या इतिहासाचे मराठी भाषांतर करून, ते लंडन येथे शिळाछापाने छापून इकडे पाठविले. विलायतेला छापलेला हाच पहिला ग्रंथ होय. त्यानंतर सन १८४३ त मोडी लिपीत शिळाछापावर छापलेला रंगो बापूजीची कैफियत हा दुसरा सुप्रसिद्ध ग्रंथ होय. हा जवळ जवळ तीनशे पानांचा मोडी ग्रंथ (प्रत्येक पानाचा आकार ८" x ५) रंगो बापूजीने स्वता आपल्या मोत्यासारख्या बारीक वळणाने एकटाकी लिहून काढलेला आहे. मोडी लेखनाचे हे सुंदर प्रदर्शन मराठी भाषेचा अलंकारच होय.
अलपिष्टन गवर्नरची सातार्याला भेट
अंग्रेजी सत्तेच्या प्रसारासाठी किंवा टिकावासाठी झटणार्या हरएक गोर्या असामीला गवर्नर किया गवर्नर जनरलच्या हुद्यावर चढवून त्याच्या श्रमाचा मोबदला देण्याची आंग्रेजांची वहिवाट पहिल्यापासून आहे. १९१४ च्या पहिल्या महायुद्धात इंग्लंड पैशाच्या बाबतीत कफल्लक झाले. अमेरिकडे दातविचकणी करायला अनेक अंग्रेज मुत्सद्दी गेले, पण सारे हात हालवीत परत आले.
अखेर लॉर्ड रीडिंग या यहुदी गोर्याला निवडले त्याने प्रतिज्ञा केली की एका बोटीने जातो आणि दुसर्या बोटीने सोन्याच्या लगडी घेऊन येतो. त्याने अमेरिकेच्या मुत्सद्याना आपल्या मारवाडी शास्त्राने ‘बनवले’ नि खरोखरच तो इंग्लंडसाठी नुसते सोनेच नव्हे तर युद्ध थांबविण्यासाठी जोरदार मध्यस्थीचे वचनहि घेऊन आला. या त्याच्या राष्ट्रसेवेबद्दल त्याला हिंदुस्थानची व्हाइसरायकी देऊन इंग्लंडने त्याचे उपकार फेडले.
अलपिष्टनाने तर काय, मराठ्यांचे सारे साम्राज्यच कंपनीच्या घशात बिनबोभाट उतरविण्याची लोकविलक्षण कामगिरी बजावलेली तेव्हा त्याला कंपनीने ३० ऑक्टोबर १८१९ रोजी मुंबईचा गवर्नर बनवून आपली कृतज्ञता व्यक्त केली. कर्नल ब्रिग्ज सातार्याचा रजिदंट असताना सन १८२२ साली अलपिष्टन मुद्दाम गवर्नर नात्याने सातार्याला भेटायला आला. त्यापूर्वी त्याने प्रतापसिंहाच्या राजकरणी कर्तबगारीबद्दल पुष्कळच ऐकले होते.
त्याने महाराजांच्या सर्व कारभाराची कसून तपासणी केली. त्याने ‘केली’ म्हणण्यापेक्षा खुद्द प्रतापसिंहानेच निरनिराळी खाती तेथला कारभार नि व्यवस्था हिशेबनिसाच्या कचेरीतील जगाचे मासिक ताळेबंद, न्यायनिकालांचे अहवाल वगैरे सर्व कागदपत्र स्वताच दाखवून, इंग्रेजांच्या बरोबरीने माझा कारभार चालला आहे का नाही, ते पहा. असेच अलपिष्टनाला दाखवून दिले. या भेटीची हकिकत अलपिष्टनाने आपल्या एका मित्राला पत्राने कळविली. ती अशी :
“सातार्याचा हा छोटा राजा किती छान माणूस आहे म्हणून सांगू! दरबारात आम्ही दोघे दोन मसनदीवर बसलो. दरबारी रिवाजाप्रमाणे आम्ही एकमेकाशी एक शब्दहि बोललो नाही. पण दरबार आटोपून आम्ही ‘खिलवाती`त (प्रायवेट पेम्बर) गेलो मात्र, राजाने भराभर आपल्या कारभाऱ्यांकडून दिवाणी फौजदारी कामांची नोंदणीबुके, राज्याच्या जमाखर्चाची बजेटे नि अंदाजी तक्ते मागवून, तो मला स्वता ती समजावून देऊ लागला. आपल्या रयतेची पिकाची नि इतर माहिती देताना तो माझ्यापुढे एकाद्या तरुण कलेक्टरप्रमाणे बोलत होता. तो आपल्या खास दिवाणखान्यात बसून तेथे न्यायदानाचे काम कमाल वक्तशीरपणाने करीत असतो. आम्ही शिकारीला गेलो. सातारच्या रसिदंटाचा मदतनीस मि. मोरीस आमच्या बरोबर होता, त्याच्या घोड्याला ठेच लागली नि तो तडाड अगदी माझ्या समोर कोसळून खाली पडला. आम्हाला तर वाटले की मोरीस ठार झाला. मी घोड्यावरून उतरून त्याच्याकडे जाणार, तोंच माझ्या आधी मोरीसचे रक्तबंबाळ डोके आपल्या ढोपरावर सांवरून एक जवान त्याला प्राथमिक उपचार करताना मी पाहिला. कोण होता तो सांगू का? छत्रपति प्रतापसिंहच होता तो. त्याने झटकन आपला घोडा सोडून देऊन, मोरीसच्या मदतीला तो धावला."
पुन्हा सन १८२६ सालीही अलपिष्टन प्रतापसिंहाच्या भेटीला आला, तेव्हा त्याने लिहून ठेवले, "मराठ्यांचे कुळात प्रतापसिंहाइतका सुसंस्कृत पुरुष मला दुसरा आढळला नाही. त्याने राज्यात उत्कृष्ट व्यवस्था ठेवली असून, रस्ते, पूल, पाण्याच्या सोयी वगैरे जागजागी करून लोकसुखासाठी तो सारखा झटत आहे. त्याच्या वाड्यातली बसण्याची खोली मला अप्रतिम वाटली. या ठिकाणी शिवाजीचा हा वंशज हिरवी सफलाद घातलेल्या टेबलावर आपली दररोजची रोजनिशी, पत्रव्यवहार आणि दिवसा घडलेल्या भेटीगांठी, भानगडी आणि स्वताचे विचार लिहित बसतो, हे पाहून कोणास कौतुक वाटणार नाही? असल्या सज्जन नि शांतवृत्तीच्या वंशजाविषयी त्याच्या पूर्वजांना काय बरे वाटले असते? सांगवत नाही!"
सन १८२९ साली (मालकम गवर्नरची कारकीर्द) मुंबई सरकारचा खास राजकारणी खलिता विलायतेला गेला. त्यात - ‘‘सातारच्या राजाच्या कारभाराने आम्ही कमाल संतुष्ट आहोत. त्याची शांत वृत्ति, काटकसरीने कारभार चालविण्याची शहामत आणि अखंड कार्यमग्नता, या बाबतीत हिंदुस्थानातला एकहि इतर राजा त्याच्या पासंगाला पुरणार नाही." असा शेरा दिला होता.
ता. २१ सप्टेंबर १८३१ त विलायतच्या डायरेक्टरानी मुंबई सरकारला लिहिले कीं ‘‘सातार्याच्या राजाच्या स्वभावाविषयी आणि त्याच्या राज्यकर्तृत्वाविषयी आमच्याकडे जे रिपोर्ट आलेले आहेत, त्यावरून आमचा त्या राजाविषयी झालेला अतिशय अनुकूल ग्रह कायम झालेला आहे."
“अतिशय दक्षतेने यशवंत राज्य कोणते असे मला विचारले तर मी राजा प्रतापसिंहाने चालवलेल्या सातार्याकडेच बोट दाखवीन, या राजाने आपल्या राज्यांत जितक्या सुधारणा केल्यात तेवढ्या आमच्या ताब्यातल्या मुलखातहि आम्हाला साधल्या नाहीत." असेहि उद्गार अलपिष्टनाने काढले.
महाबळेश्वराची प्राणप्रतिष्ठा.
महाबळेश्वरामुळे प्रतापसिंहाचे नाव अजरामर झाले आहे, कारण सह्याद्री पर्वताच्या या उत्तुंग शिखराला हवा खाण्याचे सरदारी स्थान म्हणून आज जे महत्व प्राप्त झाले आहे, त्याची प्राणप्रतिष्ठा प्रतापसिंहाने केली. १४ ऑक्टोबर १७९१ रोजी, मॅलेट नि प्राईस या दोन इंग्रेज गृहस्थांबरोबर सवाई माधवराव एकदा महाबळेश्वरास गेला होता, पण ही जागा उन्हाळ्यात थंड हवेसाठी चांगली वसाहतशीर करता येईल, ही मूळ कल्पना सातारचा ४ था रसिदंट लॉडविक याची. प्रतापगडचा किल्ला नि तेथले भवानीचे देऊळ सातारा स्वराज्याच्या हद्दीत येत नव्हते. ती तर भोसल्यांची कुलस्वामिनी. १८२३ त प्रतापसिंहाने मागणी केल्यावरून कंपनीने तो किल्ला नि देवालय त्याच्या हवाली केले. १८२४ च्या मार्च महिन्यात प्रतापसिंह दोन हजार पायदळाच्या लवाजम्यानिशी प्रतापगडाला गेला. देवीची महापूजा बांधली, मोठा उत्सव केला.
कर्नल हिरजच्या सांगण्यावरून महाराजानी आपल्या खर्चाने सातार्याहून महाबळेश्वर तो थेट पुढे प्रतापगडापर्यंत गाडीचा सुंदर रस्ता तयार केला. तोच पुढे महाडपर्यंत नेण्यात आला. महाबळेश्वरावर पहिला बंगला ब्रिग्जने बांधला. १८२७ साली एलफिन्स्टन गवर्नरीच्या जागेवरून निवृत्त झाला. तो स्वदेशी जाण्यापूर्वी, त्याला सर्व इलाख्यातल्या जनतेने मानपत्र दिले. त्यावर पहिली सही प्रतापसिंहाने केली. पुढे मालकम गवर्नर झाल्यावर महाबळेश्वरी त्याच्या नावाने मालकम पेठ वसवून, सन १८२८ त प्रतापसिंहाने महाबळेश्वराची प्राणप्रतिष्ठा केली.
या नव्या पेठेला महाराजानी आपलेच नाव देऊन प्रताप पेठ वसवावी, अशी मालकमची सूचना होती. पण ती छत्रपतीनी अमान्य केली. आपल्यासाठी प्रतापसिंहानेहि एक छानदार बंगला बांधला होता. पण पुढे त्याच्यावर आंग्रेज उलटल्यानंतर वैतागाने त्याने तो पायासकट उखडून काढला, (३०-४-१८३३)
सन १८३६ साली प्रतापसिंह अलपिष्टनाच्या निमंत्रणाने पुण्याला भेट देण्यासाठी गेला होता. तेथल्या पेशवेनिष्ठ सनातनी भटाना महाराजांची स्वारी आवडली नाही. त्यानी घरांची दारे खिडक्या लाऊन आपल्या सोवळ्या भावना व्यक्त केल्या. पण कंपनीच्या अधिकाऱ्यानी आणि इतर हजारो नागरिकानी प्रतापसिंहाचे थाटात स्वागत केले.
ता. ६ ऑक्टोबर सन १८३३ रोजी लॉर्ड क्लेअर हा मुंबईचा गवर्नर महाराजांच्या भेटीला सातार्याला आला. तेव्हा त्याने लिहिले कीं. ‘‘प्रतापसिंह तरूण, ठेंगू, लठ्ठ नि गौरवर्णाचा आहे. त्याचे कपाळ रुंद असून डोळ्यांत तीव्र चमक आहे. लोकांस विद्यादान देण्याची त्यास मोठी हौस असून त्यासाठी सातार्यास त्याने पाठशाळा घातली आहे. त्यात इंग्लिश, पर्शियन, मराठी या भाषा शिकवल्या जातात. राममोहन रॉय या सुप्रसिद्ध सुधारकाची हा राजा मोठी वाखाणणी करतो. त्याचा भाऊ आप्पासाहेंब जड व निर्बुद्ध दिसतो, त्याच्या तोंडावर तेज कसे ते बिलकूल नाही. त्याची अक्कलहि बेताचीच असल्यामुळे, लोकांस त्याच्याविषयी मुळीच आदर वाटत नाही. प्रतापसिंहाला मुलगा नसल्यामुळे आपासाहेब पुढे गादीवर आल्यास कठीण प्रसंग ओढवेल असे लोकांस वाटते, त्या ऐवजी लोकांचे डोळे बाळासाहेब सेनापतीकडे लागतात. कारण तो हुशार नि तरतरीत आहे.’’
सन १८३० साली इंग्लंडचा राजा चवथा विल्यम याच्या प्रधान मंडळाने प्रतापसिंहाला दोन इंग्रेजी पुस्तके आणि एक सन्मानाचे पत्र पाठविले त्यात इंग्लंड व हिंदुस्थानांतील राजकारणी, भौगोलीक व ऐतिहासिक माहिती होती.
पुण्याचा कारभार पहाणार्या रॉबीन्सन साहेबाने प्रतापसिंहाला विलायतचा प्रवास करण्याची शिफारस केली. भाडे एक लाख रुपये आणि इतर चार लाख, मिळून अवघ्या पांच लाखात यात्रा होईल. त्यावर प्रतापसिंह आपल्या डायरीत लिहितो की मुख्य अडचण पैक्याची, बाकी कंसलीहि नाही. धर्माची अडचण आहे, पण परत आल्यावर प्रायश्चित घेतले म्हणजे झाले. संधि मिळाली तर अगत्य जाऊ. मुलूक पहायला मिळेल. इंग्रज लोकांशी घसट पडून त्यांचा अस्सल स्वभावधर्म वगैरे समजून येईल आणि आपलीहि तटलेली कामे परस्पर प्रत्यक्षपणे उरकून घेता येतील.
सातार्याला जसजसे नवे नवे गोरे अधिकारी येऊ लागले, तसतसा प्रतापसिंह अंग्रेजी स्वभावातल्या खाचाखोचा चांगल्याच ओळखू लागला. एकदा लॉर्ड क्लेअर गवर्नर त्याला म्हणाला,‘माझे मनात महाराजाशी फार बोलावयाचे आहे. परंतु हिंदुस्थानी भाषा येत नाही. आलपिष्टन मालकम वगैरे सरदार याणी सांगितल्याप्रमाणेच महाराजाचे मुलकी इनसाफ, रस्ते वगैरे बंदोबस्त फार चांगला आहे.’ त्यावर महाराज आपले डायरीत नमूद करतात.- ‘किती तारीफ तरी! एक दिवस आपले कामास सोडणे घटका नाही. (आपण आपला मुद्दा कधी सोडायचे नाहीत.) आसे मतलबी गोड लबाड खास’.
रसिंदट नि तत्समान जाणत्या अधिकार्याशी प्रतापसिंह नेहमी जागतिक माहिती नि राजकारणावर संभाषणे नि चर्चा करावयाचा. सन १८३४ साली हिंदुस्थानावरील रशियाच्या स्वारीचा बोलवा फार होता. त्याविषयी प्रतापसिंह आपल्या डायरीत मोठे मार्मिक विवेचन करतो. यावरून ज्ञानप्राप्तीसाठी तो किती अखंड जागरूक असे, हे दिसून येते.
“जोतपुरचे लहानसे राज्यास जिंकावयास इंग्रज तयारी करितात असे नाही. परंतु मध्यभागी काही मोठे प्रकर्ण आहे. जेणेकरून सिंधुनदी स्वाधीन होईल आणि रंजितसिंग व सिंधी लोक व रूसचे दरबारास येकदाच धका बसेल व रूसाचा हिंदुस्थानासी संबंध तुटेल. कारण जोतपुरचा मुलूक घेतल्याने त्यास दुपट अवघड पडेल. विलायेत व इरानाहून खबरी येतात की शाहासुज्याचा मुलूक घेण्यास रूस लवकर येण्याची तयारी करितात. इरान येक वेळ आटोपले म्हणजे लवकरच हिंदुस्थानावर रूस येऊ लागलीत. पाचसात वर्षात काही तरी ठरते. आम्हासारखे गरिवास आवघड आहे. देवी सर्व काम दये पार करील. बाकी आधार नाही. दुधी नीट ठेऊ. प्रज्यापालन व इंग्रजासी वाकडे न राहणे."
सन १८३४ साली इंग्लडचे प्रधानमंडळ बदलले, जुने मंडळ रद्द करून नवे मागण्याचा तिकडील रयतेचा हक्क आहे, असे लॉडविकने प्रतापसिंहाला सांगितले. त्याला मोठे आश्चर्य वाटले. रयत गडवत करते आणि राजाचे मंत्रीमंडल उलथून पडते. हा लोकशाही चमत्कार त्याच्या आधी ध्यानातच येई ना.
लॉडविक- राजे व बादशाहयांनी दुसर्याचे स्वाधीन हुकूम ठेविला म्हणजे सदरहूविलायतेचे वर्तमान लिहून आले, त्या प्रमाणे होते. शाहू महाराजानी पेशव्याचे स्वाधीन हुकूमकेला त्याजमुळे येवढे थोरले राज्यास धका बसला. तो हुकूम आपले घरात ठेविला असता तर,आजपर्यंत राज्यास धका बसला नसता.
प्रताप- शाहू महाराजानी पेशव्याचे स्वाधीन हुकूम केला नव्हता. विश्वासावर गेले हिंदू धर्माने. परंतु त्यांनी बेइमानी केली. दुसर्यापासी हुकूम न ठेवणे हे खरे आहे. फौज, खजिना, हुकूम व इनसाफ या च्यार गोष्टी राजा व बादशाह याने आपल्याजवळ ठेवाव्या.
असला हा उमदा प्रागतिक लोकप्रिय राजा भटाबामणांच्या चिथावणीने आंग्रेजानी कसा नेस्तनाबूद केला, हे यापुढे आपल्याला पहावयाचे आहे.
प्रकरण ११ वे
कलिपुरुष बाळाजीपंत नातूची कारस्थाने
नेटिव असिस्टंट म्हणून ग्रांट रसिदंटाच्या हाताखाली खर्डी घाशीत बसला असतानाहि, बाळाजीपंत नातूच्या मनात. महाराजानी आपल्याला दिवाणगिरी दिली नाही, हे शल्य बोचतच होते. त्याच्याविषयी महाराजांचे मन पक्के कलुषित झालेले असल्यामुळे, तिकडे पुन्हा शब्द टाकायची सोयच नव्हती. म्हणून तो ग्रांटजवळ संधि साधून वरचेवर दिवाणगिरीच्या नेमणुकीचा टुमणा लावीत असे. अलपिष्टनाकडेहि तो संधाने बांधीत असे. पण ते दोघे नातूच्या बारशाच्या घुगर्या खाल्लेले! प्रतापसिंहाची चालू झालेली प्रगमनशील राज्यव्यवस्था नातूसारखा कलिपुरुष केवळ स्वार्थासाठी पार नासून टाकील, तेव्हा या हरामखोर घरबुडव्याला ते तसेच दादून बसले होते. नातू म्हणजे कोण? तर इंग्रेजांच्या `इण्टेलिजन्स खात्यातला` एक प्रमुख देशी हेर. पैशासाठी त्याने आपल्या जातीच्या- स्वताच्या धन्याच्या-पेशव्याच्या-घरावर आंग्रेजांचे निशाण फडकावले. त्यापूर्वी सारखा घरभेदाचाच धंदा करून. पेशव्याच्या घरची, दरबारातली, शहरातल्या नागरिकांची बित्तंबातमी फक्त पैशासाठी इंग्रेजाना त्याने पुरवली.
असल्या पायीच्या पायतणाला डोक्यावर चढविण्याइतके आंग्रेज केव्हाहि गाफील नव्हते नि आज नाहीत. बाजीरावाने आपल्या सैन्याचा कमाण्डर नेमलेल्या पोटसाहेबाची (फोर्ड) हकिकतच पहा ना. हा गोरा अधिकारी वास्तविक पेशव्याचा नोकर पण खडकीच्या लढाईच्या वेळेला, बाजीरावाने जेव्हा हल्ला चढवायचा हुकूम सोडला, तेव्हा त्याने मोठ्या स्वदेशाभिमानाची ऐट आणून जबाब दिला- ‘‘श्रीमंत, स्वधर्मबांधवांविरुद्ध मी आपली तलवार उपसणार नाही.’’ आपण बावळट हिंदु फोर्डच्या या वर्तनाची वहावा करू नि पूर्वी पुष्कळानी केलीहि. पण खुद अंग्रेजानी त्या वर्तनाला काय किंमत दिली? पुणे शहर हस्तगत झाल्यावर, अर्थात तेथे नि आजूबाजूच्या प्रदेशात लोकांची भयंकर दाणादाण उडाली. लूटमार चालू झाली. दरोडे पडू लागले. तेव्हा शहराचा बंदोबस्त कोणी करायचा, हा महत्त्वाचा प्रश्न अलपिष्टनादि अधिकाऱ्यांपुढे पडला. एकाने नातूचे नाव सुचविताच त्याने हात जोडले. त्याला माहीत होते की यापुढे नातू पुण्यात एकटा सापडला तर लोक त्याला खरोखरच आंगावर तेल ओतून जाळून टाकतील. तेव्हा स्वधर्माभिमानाच्या तोर्याने बाजीरावला चाट पाडणारा फोर्ड अहंमन्यतेच्या ऐटीत अलपिष्टनापुढे आला नि म्हणाला.- "सर, मला सांगा शहराचा बंदोबस्त."
कपाळाला आठ्या घालून लालबुंद चेहर्याने अलपिष्टनाने एकदा त्याच्याकडे रोखून पाहिले नि तो म्हणाला.– “शरम वाटत नाही तुला? तू निमकहराम आहेस. आमचे जाती वेगळा रहा. ज्याचे अन्न खाल्लेस त्याच्या सेवेला पाठ दाखवलीस? ठेव तलवार खाली. तू आमच्यात असता कामा नये." पेशवा त्याला दरमहा सहा हजार रुपये पगार देत होता. तो एकदम अडीच हजार केला नि फक्त हिंदुस्थानात असे तोंवरच तो मिळायचा, कारण ‘तूं कंपनीच्या उपयोगी पडलास’ म्हणून असे ठरवून त्याला अलपिष्टनाने हुसकावून दिला. असले सत्यनिष्ठ अलपिष्टन किंवा ग्रांट नातूसारख्या हरामखोराला प्रतापसिंहाचा पेशवा करून त्याच्या रियासतीत नव्या भानगडी नि उचापति करायला या नराधमाला मोकळा सोडतील, हे शक्यच नव्हते. खर्डेघाशी करीत असतानाच, नातूने आपल्या चित्पावन जातभाईना रेसिडेन्सीत आणि महाराजांकडेहि संभावित भिन्नतवार्या करून नोकर्या देवविण्याचा धंदा मात्र अखंड चालविला होता.
ग्रांट सातारा सोडून निघाला (दिसेम्बर १८२२) तेव्हा त्याने या नातू पिशाच्चाला तेथे न ठेवता, लगेच पुण्याला बदलून टाकले. आपली बदली होणार नि मग सातारचा नि आपला संबंध तुटणार, ही बातमी लागतांच नातून ग्रांटची प्रार्थना करून आबा जोशी नावाच्या आपल्या भरंशाच्या एका चित्पावन तरुणाला रेसिडेन्सीत `कॉनफिडेन्शल क्लार्क’ हुद्यावर नेमण्याची कारवाई सफाईत उरकून घेतली. या छोटेखानी नेमणुकीने नातूने काय साधले, याची मात्र ग्रांटला काहीच अटकळ करता आली नाही. तिकडे विठ्ठलपंत दिवाणाच्या कचेरीत विसोबा भडकमकर म्हणून एक कारकून होते. तो आणि हा आबा यांचेकडून सातारची बित्तंबातमी रोजच्या रोज पुण्याला आपल्याला मिळण्याचे हेरगिरीचे यंत्र नातूने निर्माण केले. ग्रांट गेल्याबरोबर नातू पुण्याला पळाला, याविषयी प्रतापसिंहाने डायरीत लिहिले कीं नातू आपल्या कर्माला फार भितो. त्याला इंग्रेजांचा आसरा असला तरी घरभेदाच्या पापामुळे लोक त्याच्यावर दांत धरूनच आहेत, म्हणून तो भितो.
इकडे सातार्याला ग्रांट निघून गेल्यावर ब्रिग्ज आला. त्या वेळेस महाराजांच्या अंमलातील मुलुखाची पहाणी (सर्वे) करण्यासाठी अडॅम नावाचा एक हुशार इंजणेर गवर्नर अलपिष्टनाच्या हुकुमाने आला. त्यानेहि शेकडो लिहिणारे वाचणारे (ब्राम्हण प्रभू वगैरे) तरुणाना आपल्या खात्यात नोकरीवर जुंपले. ठरल्या तारखेला रोखठोक छमछम पगार, शिवाय अंग्रेजांचे नोकरमाने म्हणून समाजात नव्यानेच मिळणारी प्रतिष्ठा, या लोभाने आंग्रेजांच्या नोकरीत घुसण्यासाठी पांढरपेशा मराठे तरुणांच्या झुंडीच्या झुंडी सातारा पुणे खानदेशात कमिशनरांच्या कोयती घोंगावत फिरू लागल्या. नोकरी नि पेनशन या दोन आकर्षणानी इंग्रेजानी महाराष्ट्रच काय, पण सारा हिंदुस्थान आपल्या गुलामगिरीत जखडून टाकला.
सातारा नि जहागिरी यांचे सांधे नि वांधे
मागल्या ८ व्या प्रकरणात तहनाम्याचे ५ वे कलम जसे प्रतापसिंहाच्या दुर्दैवाला कारण झाले, तसेच जहागीरदारांसंबंधी ७ चे कलमहि बाळाजीपंत नातूच्या कारस्थानानी त्याला बाधक झाले. म्हणून मूळ इंग्रेजी कलम आणि त्याचे मन्हाठी भाषांतर येथे देत आहे.
ARTICLE 7th
The possessions of the Jagheerdars within His Highness`s territory are to be under the guarantee of the British Government, which on the other hand engages to secure their performing the service which they owe to His Highness according to established custom.
कलम सातवे ७
महाराज छत्रपति यांचे सरकारचा मुलूख वर करार होत आहे त्या मुलकांत जाहागीरदार आहेत. त्यांची जहागीर त्यांजकडे सरकार इंग्रेज बहादूर यांचे बहलदारीने चालेल व इंग्रेजी सरकारांतून कबूल करीत आहेत की जाहगीरदार दस्तुराप्रमाणे महाराज्यांचे सरकारांत रुजू राहून चाकरी करीत जातील... कलम.
(१) अक्कलकोटकर (२) पंत सचीव, (३) पंत प्रतिनिधी, (४) जतचे डफळे, (५) निंबाळकर आणि (६) सेख मिरा वाईकर, हे सहा जहागीरदार या तहनाम्याने, पूर्वापार वहिवाटीप्रमाणे, छत्रपतींच्या स्वामित्वाखाली आणि सत्तेखाली, परंतु कंपनी सरकारच्या हमी [गॅरन्टी] खाली रहाणार एवढा स्पष्टार्थ या कलमातून निघतो. तथापि विशेष खुबीदार शब्दांतून सोयीस्कर खुबीदार अर्थ काढण्यात वाकबगार अशा आंग्रेजानी, त्यातल्या `बहलदारी’ ऊर्फ गॅरण्टी शब्दावर पुढे, नातूच्या चिथावणीने, निराळाच अर्थ बसवून, सांध्यात वांधा कसा निर्माण केला, ते योग्य स्थळी दिसेलच,
डफळ्यांची जत, तिची भलतीच गत
अडॅम साहेबाने जत परगण्याची पहाणी केली, तेव्हा तेथे त्याला सारी अंदाधुंदी गाजलेली दिसली, डफळे मूळचे विजापूर बादशाहीचे सरदार. औरंगझीबाच्या वतीने त्यानी एकदा सातार्यावर हल्ला चढवून सुरुंगाने मंगळाईचा बुरूज पाडला. त्याला आजहि डफळ्यांचा बुरूज असे म्हणतात. मुसलमानी सत्तेचे उच्चाटन झाल्यावर डफळे पेशव्यांच्या सावलीत सरदार म्हणून राहिले. प्रतापसिंह गादीवर आला तेव्हा कान्होजीराव जतचा जहागीरदार होता. तो सन १८१० त निपुत्रिक वारला, म्हणून रावबाजीने ती जहागीर आपला जानीदोस्त त्रिंबकजी डेंगळे याला इनाम दिली.
त्रिंबकजीने जतचा ताबा न घेता, कान्होजीची बायको रेणूकाबाई हिच्या वहिवाटीखालीच ती जहागीर चालू दिली. काही गांये रेणुकाबाईकडे, तर काही तिची सवत साळूबाई बळकाऊन बसलेली, म्हणजे सवती सवतीच्या झगडात जहागिरीची चाललेली याताहात आणि कायदेशीर मालक कोण? तर त्रिंबकजी, तो तर तिकडे ढुंकूनहि पाही ना, गुंडपुंडाना आयतेच फावले, जो उठला तो गावेच्या गावे बळकाऊन बसला. बंडाळी नि बेबंदशाही माजली.
१८१९ च्या तहनाम्याप्रमाणे जत महाराजांच्या स्वामित्वाखाली, अशी कंपनी सरकारनी कबुली दिलेली. अडॅमने अराजक माजल्याची छत्रपतीकडे बातमी देतांच (सन १८२०) महाराज बरोबर मोठे सैन्य घेऊन जत परगण्यात गेले आणि थोड्याच दिवसांत तेथल्या बंडखोरांना चेचून काढून, सगळीकडे स्थिरस्थावर केली. नये कारभारी नेमून, कारभाराची शिस्त लावली आणि रेणुकाबाईशी तह ठरवून तिच्या हवाली जहागीर केली. पुढे रेणुकाबाई आणि साळूबाई वारल्यावर, प्रतापसिंहाने वारसाचा शोध करून. कान्होजीचा आजा यशवंतराव याच्या दुसऱ्या मुलाचा मुलगा रामराव याला वारस कबूल करून जतच्या गादीवर बसवले. हाहि निपुत्रिकच असल्यामुळे, त्याने महाराजाकडे दत्तकाची परवानगी मागितली. पण एकंदर विचित्र परिस्थिति पाहून महाराजानी तो प्रश्न तहकूब ठेवला.
नातूचे सातारचे एजंट आबा नि विसोबा यांचे त्याच्याशी पुण्याला जंतरमंतर चालूच होते. रामरावला दत्तकाची परवानगी महाराज देत नाहीत, एवढी बातमी बाळाजी काशी किबे याजकडून समजताच, नातूने रामरावशी संधान बांधले. अहो, या छत्रपतीला विचारतो कोण? आंग्रेजानी निर्माण केलेले हे कळसूत्री बाहुले. चला, तुमच्या दत्तकाची मसलत मी थेट गवर्नरापर्यन्त नेऊन भिडवतो नि तुमचे काम करतो, अशा थापा मारून नातूने रामराव डफळ्याकडून सोळा हजार रुपये काढले. अखेर बिचारा निपुत्रिक म्हणूनच १८३९ साली देवलोकीं गेला.
सचिवाचे भोर, त्याला छत्रपतीचा घोर
प्रतिनिधीप्रमाणेच सचीव हेहि छत्रपतीने निर्माण केलेले. छत्रपतीच्या तक्ताचे सेवक, पण पुढे पुढे पेशव्यांची सत्ता भरारू लागल्यावर, छत्रपतीना धाब्यावर बसवून स्वताची बामणी सत्ता स्वतंत्र मानण्याकडे पंतसचीवांच्या धडपडी चालू असत. मरगठ्या छत्रपतींपेक्षां ब्राम्हण पेशवा धनी बरा, असे त्याना वाटू लागले. पेशवाईला घरघराट लागला तेव्हा भोरचा जहागीरदार पंत सचीव चिमणाजी शंकर होता. तो नेहमी रावबाजीच्या पाठीशी चिकटून असे. ११ फेब्रुवारी १८१८ या अलपिष्टनाचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच, टेम्बुरणीच्या मुकामाहून श्रीमंताना अखेरचा दण्डवत घालून, चिमणाजी सचिवाची स्वारी एकदम येऊन आंग्रेजांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात घालती झाली. कुंफणी सरकार बहादुरची बहलदारी [गॅरण्टी] आणि सातारच्या छत्रपतींचे मांडलिकत्व बिनशर्त मान्य करणारा तह करून, सचीव भोर जहागिरीचे कुंपण राखीत बसले.
चिमणाजी शंकराने रघुनाथ नावाचा एक मुलगा दत्तक घेतला. पण तो सचीवपत्नी भवानीबाईला पसंत नव्हता. चिमणाजी मेल्यावर रघुनाथ आणि भवानीबाई यांच्यांत रोज खडाजंगी भांडणे होऊ लागली. कारभाराचा विचका उडाला नि रयत हैराण झाली. हे समजताच प्रतापसिंहाने मायलेकाला सातारला बोलावून घेतले आणि दोनही बाजू ऐकून घेऊन, निवाडा दिला. भवानीबाईने सातार्यासच सचिवाच्या वाड्यात रहावे आणि पंताने तिच्या खर्चाची बेगमी करावी. अशा रीतीने महाराजानी भोरच्या जहागिरीतल्या कलहाच्या भूताला गाडून टाकले,
गवर्नरापासून नजिकच्या रसिदंटापर्यन्त सगळ्याना तोंडात बोट घालायला लावण्याइक्या प्रागतिक धडाडीने आणि कमाल समजूतदारपणाने प्रतापसिंह आपला राज्यकारभार चालवीत होता आणि एकीकडे नातू कंपू त्याला भानगडींच्या पेचात खेचण्याची संधि पहात कावळ्यांसारखा टपून बसला होता. सातारच्या आबा जोशी, बाळोजीपंत किबे आणि विसाजीपंत भडकमकर प्रभृति नातूच्या एजंटानी आस्ते आस्ते भवानीबाईपर्यन्त आपला शिरकाव करून घेतला आणि तिचे कान फुंकले. रघुनाथाच्या दत्तविधानाला कुंफणी (कंपनी) सरकारची संमति मिळालेली नसल्यामुळे झालेले दत्तविधान आपण अंग्रेजांकडून नाशाबित करून घेऊ छत्रपतीच्या तडजोडीला कोण धूप घालतो? वगैरे गोष्टी सांगून या ब्रह्मपुत्रानी भवानीबाईचे मन बिथरऊन तिच्या पैशाच्या पिशवीला भले मोठे भोक पाडले.
बामण बच्च्या! तशात चित्पावन! तो काय रोख दक्षिणेशिवाय मंत्राच्या भानगडीत पडणार? प्रतापसिंहाच्या तडजोडीला तुंकार दाखवून, भवानीबाईच्या गुप्त कारस्थानाचे धागे थेट नातूपर्यन्त भिडले. आबा किबे भडकमकर एजंट तिला हरहमेश काही ना काही खबर देऊन तिच्यापासून पैसा काढू लागले. रघुनाथ नाशाबित झाला तर आपल्याला नवा पसंतीचा दत्तक घेऊन भोरास कर्तुमकर्तुमपणाने राज्य तरी करता येईल. नुसते सातारला ऐदी बसून मरेपर्यन्त जगण्यात अर्थ काय? या विचाराने भवानीबाईच्या अंगात भवानी संचारली.
तिकडे भोरासहि रघुनाथपंताच्या मनात छत्रपतीच्या ताबेदारीचे वैषम्य घर घरीत होते. चिमणाजीला दत्तकाची परवानगी देताना, प्रतापसिंहाने हुकूम केला होता की पुढच्या सर्व सचिवानी छत्रपतीला दरसाल १५ हजार रुपये नजर भरली पाहिजे, त्याप्रमाणे दरसाल ही खंडणी सातार्याला येत होती. आम्हाला ही खंडणी भरण्याची सक्ती नसावी, अशी खटपट करण्याबद्दल नातूने रघुनाथाला चिथावले. त्याने (आगष्ट १८२७) एलफिन्स्टनची गाठ घेतली. ११ फेब्रूवारीचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच, सर्वांच्या आधी आपल्या चरणावर लोटांगण घालणारा, म्हणून सचिवाबद्दल त्याला कितीहि मोठा राजकारणी जिव्हाळा वाटत असला, तरी १८१९ च्या तहनाम्याच्या शर्तीप्रमाणे सचिवाचे छत्रपतीशी बिनशर्त मांडलिकत्व त्याला अमान्यकरता येईना. रघुनाथपंताची कैफियत ऐकून घेऊन एलफिन्स्टनने स्पष्ट खुलासा केला.-
"Although you and your heirs are to hold your jagheer on certain stipulated terms, yet that, on a total failure of heirs, it must revert to His Highness the Raja, and that if His Highness allows it to be continued in such case by adoption or otherwise, His Highness is at liberty to attach what conditions he pleases to the permission."
(तुमची गादी बेवारस झाल्यास ती चालविणे अथवा ती जहागीरच आपल्या राज्यास जोडणे, ही गोष्ट सातारच्या महाराजांच्या इच्छेवर राहील. तुमच्यावर वाटतील त्या अटी लादायला ते मुखत्यार आहेत.)
एलफिन्स्टनने स्वतः हा जबाब दिल्यामुळे, रघुनाथाचे हातपायच गळले. पण भोराजवळ पुण्यास बाळाजीपंत नातू होताच. त्याने लगेच पंताकडे आपलो खास दूत पाठवून, थोडा दिवसांत अलपिष्टन स्वदेशी जाणार आहे. तेव्हा नवा गवर्नर येताच सरकारातून मी तुमची दाद लावून देतो, असे कळविले. बाळाजीपंत नातू म्हणजे आंग्रेज अधिकान्यांच्या नाकातला बाल! थेट वशिल्याचे तट्टू! हो, या महात्म्याच्या गळ्याला मिठी मारली तर हेतूची वैतरणी तरून आपल्याला पार जाता येईल, अशी पंताची खात्री पटली.
थोड्याच दिवसानी बाळाजीपंत नातू महाशय आपणहून पंताच्या भेटीला भोरास गेले. आपल्या अडचणीबद्दल खरा कळवळ्याचा माणूस हा, असे बावळट पंताला वाटले. काम जाम फत्ते करून देतो वगैरे लोणकढी थापेबाजी करून नातूने पहिल्या तडाक्यालाच पंताकडून मुसेखोरे नि मुठेखोरे यातले दोन गांव स्वताला इनाम करून घेतले. पण दक्षणेशिवाय दान सफल होत नसते, म्हणून ठरल्या कामगिरीच्या खटपटीसाठी दरसाल २ हजार रुपये नक्त दक्षणा नातूने घेण्याची सुरुवात केली. एवढ्याने थोडेच थांबते? पंताच्या दरबारात नातूने आपल्या अनेक चित्पावन जातभाईंची वर्णी लावून घेतली. म्हणजे भोरासहि आपली न्यूज एजन्सी (बातमीयंत्रे) स्थापन केली. नंतर वेळोवेळी निरनिराळ्या कामगिऱ्यांच्या सबबीखाली नातू रघुनाथपंताकडून मन मानेल तशा मोठमोठ्या रकमा सहज पिळून काढू लागला. पंताच्या पूर्वजानी अनेक शिवभक्तांची वतने गिळून भोराची भर केली. नातूने या देशस्थभटाच्या तिजोरीला चित्पावनी गिरमीट लावून भरभक्कम नागवणूक चालू केली. सारांश, सातार्याला भवानीबाई आणि इकडे भोरास रघुनाथपंत ही पैसा उकळण्याची दोन सावजे नातूने पक्की पकडीत धरून ठेवली. कोणाचे काहीहि बरे न करता, उमाप इनामे नि पैका हबकणारा नातूसारखा इलमी असामी भूतो (झाला), पण पुढे न भविष्यति.
प्रतापसिंहाची अक्क्लकोटावर स्वारी
अक्कलकोटच्या जहागिरीने मात्र नातूच्या कारस्थानाना चांगलेच क्षेत्र दिले. येथले जहागीरदार भोसले आडनाव लावीत असले, तरी ते भोसलेवंशज नव्हते. शिवेर परगण्यातील पारद नावाची गढी थोरल्या शाहूने तेथल्या पाटलाला मारून फत्ते केली. त्या पाटलाच्या बायकोने आपला एकूलता एक मुलगा लढाईच्या गर्दीत शाहूच्या पायावर आणून घातला नि म्हणाली "यास वांचवाये. अन्यायी होते ते गेले. मुलाचा अपराध नाही." तेव्हा शाहूने त्या मुलाला आपला मानून फत्तेसिंग भोसले असे नाव दिले. तोच या अक्कलकोट जहागिरीचा मूळपुरुष, शाहूनंतरच्या छत्रपतीना अक्कलकोटकर फारसे जुमानीत नसत.
आम्ही स्वतंत्र आहोत, आमचा नि सातारच्या छत्रपतींचा मांडलिकपणाचा मुळीच संबंध नाही, असा त्यांचा दावा असे. पुणे पडण्यापूर्वी थोडे दिवस अक्कलकोटकरानी एलफिन्स्टनकडे हाच सवत्या सुभ्याचा दावा जोराने मांडला होता. [सन १८१८ त चिटणीसानी रंगो बापूजीला अक्कलकोटला पाठविले. तेथल्या फितुरीचे नि बंडाचे कागद सरकारी आज्ञेवरून त्याने मुंबईला पकडले. - बंडवाल्यानी त्याला कैद केले, हा ६ व्या प्रकरणातला संदर्भ याच भानगडीविषयी होय.] पण साहेबाने तिकडे लक्ष दिले नाही.
सन १८२७ त त्या वेळच्या फत्तेसिंग राजे भोसल्याने प्रतापसिंहाचे स्वामित्व उघडपणे नाकारले. मानी प्रतापसिंह थोडाच असल्या अवमानापुढे मान वाकविणार! त्याने स्वारीची तयारी करण्याचे हुकूम सोडले. बळवंतराव सेनापति यांच्या सेनापतित्वाखाली लष्कर अक्क्लकोटाला रवाना केले. मोठी मातबर लढाई झाली. इंग्रेजांचा एक ट्ररूप कमांडर पडला. रिसालदार दौलतखान याने अक्कलकोटचा भुईकोट किल्ला सर करताना पराक्रमाची शिकस्त केली. सेनापतीने सारा मुलूख पादाक्रांत करताना अपल्या समशेरीची जरब चांगलीच दाखवली. अखेर उभयपक्षी समेट होऊन अक्कलकोटकरानी सन १८१९ च्या तहनाम्यातल्या जहागिरदारांविषयी ७ व्या कलमाला बिनशर्त मान्यता दिली. या लढाईत महाराजाना एक लाख रुपये खर्च आला. तरीहि आप्तपणा स्मरून अक्कलकोटकरांचा जिंकलेला तीन लाखांचा मुलूख त्यांचा त्याना परत दिला. मात्र जहागिरीच्या कारभारावर देखरेख करण्यासाठी आपले खास अधिकारी नेमले. या स्वारीमुळे अक्कलकोटकर महाराजावर कायमचे नाखूष झाले,
अक्क्लकोटलाहि नातूचे एजंट
अक्कलकोटची स्वारी फत्ते करून महाराजानी तेथल्या कारभारावर देखरेख करण्यासाठी आपले कारकून नेमले, याचे अक्कलकोटकर भोसल्याना वैषम्य वाटणे सहाजीक होते. त्यांच्या तडफडाटाचा नातूने सोयीस्कर फायदा घ्यायला सोडले नाही. पुण्याच्या आंग्रेज अधिकार्याना त्याने कायदेबाज कानमंत्र दिला की, छत्रपतीची अक्कलकोटच्या जहागिरीवरची सत्ता तहनाम्याने आणि स्वारीने सिद्ध केली असली, तरी कंपनी सरकारने महाराजांच्या सर्व जहागिरदाराना तहनाम्याच्या ७ व्या कलमाने `बहलदारीचे’ (गॅरण्टीचे) आश्वासन दिलेले आहे. तेव्हा महाराजांच्या कारकुनांबरोबरच कंपनी सरकारचेहि काही कारकून अक्लकोटास ठेवणे शांततेच्या हेतूने अगत्याचे आहे. अधिकार्याना हा सल्ला पसंत पडतांच, नातूने तात्काळ सातारा रेसिडेन्सीतले आपले पित्ते अक्कलकोटास नेमून टाकले. त्यांची नांवे नि दरमहा पगार असे. आबा जोशी रु. ११० दाते रु. ११०, श्रीधरपंत रु. ५५ आणि शास्त्री रु. १३०, एकूण दरमहा रु. ४०५. शिवाय या महाभागांच्या नि अक्कलकोटकरांच्या संरक्षणासाठी चारपांच संत्री ठेवले ते निराळेच. अशा रीतीने जत आणि भोर प्रमाणेच अक्कलकोट येथेहि नातूने आपली कारस्थानी गिरमिटे सफाईत स्थापन केली.
‘साहेबासंगे मी विलायतेला येतो’
कारस्थानी लोक भ्याड असतात. इतरांचे गळे कापण्याची कर्म ते जरी सफाईत उरकतात, तरी स्वतःच्या सुरक्षितते विषयी ते नेहमी काळजीतच असतात. अनेक लांड्यालबाड्या करून बाळाजीपंत नातू स्वतः नि आपल्या हस्तका मार्फत, समोर दिसेल त्याला गंडवीत चालला होता, तरी त्याला स्वताविषयी असलेल्या लोकांच्या तिटकार्याची पुरी जाणीव होती. त्याच्या स्वजनद्रोही खटाटोपांचा पुरस्कर्ता अलपिष्टन जोंवर तो होता, तोंवर नातू निर्धास्त होता. पण तो जेव्हा मुंबईच्या गवर्नरीवरून स्वदेशी जाऊ लागला, तेव्हा नातूचा धीर सुटला. या पाचवडच्या भटाला रंकाचा राव केले अलपिष्टनाने, तोच त्याचा पुरस्कर्ता आश्रयदाता हिंदुस्थान सोडून कायमचा जाताना बिचाऱ्या बाळाजीपंताची पाचावर धारण बसली. या विषयी प्रतापसिंहाने डायरीत नोंद केलेली आहे.
"डाकतर (मिल्न) लिहितात की, आलिपिष्टन गेले ते वेले बालाजीपंत नातू ब्राम्हण आसून बोलला, तुम्ही जाता. (माझे इकडे कसे होणार?) माझा दावा इकडील ब्राम्हण करितात. मग खातरी केली गवरनुरानी. तेव्हा राहिला. नाही तरी नातू (विलायतेला) जात होते." सारांश, या बामणाला छत्रपति महाराजाप्रमाणेच ब्राम्हणहि पक्के पाण्यात पहातात. एवढे मात्र आंग्रेजी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.
ता. ३१ आकटोबर १८२७ ला अलपिष्टनने गवर्नरीचा चार्ज सोडला आणि त्याच्या जागी सर जॉन मालकम गवर्नर झाला. (ता. १-११-१८२७).
प्रकरण १२ वे
भटी वर्चस्वाचा ज्वालामुखी धुमसू लागला
चालू घडीचा मामला धार्मिक सामाजीक नि राजकीय बाबतीत व्यक्तिस्वातंत्र्याचा आणि स्वयंनिर्णयाचा आहे. मराठ्यांची, विद्यमान तरुण पिढी तर देवाला नि धर्माला अफूच्या गोळ्याच मानते.
धर्मावांचुनि प्राण न जाई, देवाविण नच अडते ।
आत्मशक्ति सबीर तयाच्या त्रिभुवन पाया पडते ।
याची त्याना पुरी प्रतीति आलेली आहे. सामाजीक उच्चनीचतेच्या वादात सध्या सहसा कोणीच पडत नाही. पडलेच तर तेथे परस्परांत पायतणांचे पानपत थाटल्याशिवाय रहात नाही. ऐदी जीवनाच्या खेडयांत भटाबामणांच्या सर्वांगीण श्रेष्ठत्वाची मिजास असूनहि थोडीबहुत चाललेली असली तरी शिक्षणप्रसाराने मंतरलेली गांव नि शहरे येथे आब्राम्हण चाण्डालादि अखिल हिंदू जनता, आंग्रेजांचे गुलाम म्हणून, शूद्रत्वाच्या नि क्षुद्रत्वाच्या एकाच पाट्यावरवंट्याखाली अभेदाने चिरडली जात आहे. (हे वर्तमान आता भूतकाळ बनले.) एकजात शूद्रांनी गजबजलेल्या हिंदुस्थानावर इंग्रेज हे ब्राम्हण नि क्षत्रिय अधिकाराने मन मानेल ती पेशवाई गाजवीत आहेत. अशा अवस्थेतल्या अस्पृश्यांसह बामण बामणेतर हिंदू जनांना पूर्वीच्या लोकानी धर्माधिकाराच्या अट्टहासी आग्रहासाठी केलेले ग्रामण्यांचे तंटे म्हणजे पूर्वजांच्या मूर्खपणाची प्रदर्शनेच वाटणार. पण तुम्हा आम्हाला स्पष्ट पटणारा मूर्खपणा एका काळी त्या पूर्वजांच्या सामाजीक इभ्रतीच्या जिव्हाळ्याचा, म्हणूनच शहाणपणाचा प्रश्न होता.
जुन्या इतिहासातल्या ग्रामण्यांच्या घटनांकडे आधुनीक विचारक्रांतीच्या चष्म्यातून पाहून निर्णय देणे सोपे असले, तरी ते न्यायीपणाचे होणार नाही. प्रत्येक कालखंडातल्या लोकांच्या आचार विचारांची मोजमाप तत्कालीन रूढी, समजुती, कल्पना, भावना आणि श्रद्धा यानीच करावयाची असते. असे केले नाही तर शिवाजी सारख्या लोकोत्तर पराक्रमी पुरुषोत्तमालाहि त्याच्या धार्मिक भावनांच्या हेक्यापायी नादान ठरवून सांदीला टाकण्याची आपत्ति टळत नाही. औरंगझीबासारख्या शतमुखी रावणालाहि ज्याने नामोहरम करून मराठ्यांचे स्वराज्य स्थापन केले, तो स्वतःला राजाभिषेक करून घेण्यासाठी भटाबामणांच्या मिथा करीत बसतो? या मुकाबल्याचा आपल्याला अर्थच लागणार नाही. महाराष्ट्रातील मराठे कायस्थादिकांचा जन्मजात क्षत्रियत्वाच्या अधिकाराचा अट्टहास आणि त्याला चित्पावन बामणांचा कस्सून विरोध, यांत सामाजीक अन्यायाचे कोणते तत्व, धर्म म्हणून ब्राम्हण त्यांच्यावर लादीत होते, एवढेच इतिहासकाराने दाखवायचे आहे. आज विकास पावलेल्या कल्पनांशी त्याची तुलना करायची नसते. आज आम्हाला जी गोष्ट मूर्खपणाची वाटते, तिचा पुरस्कार करण्यात आमच्या पूर्वजानी प्राणांतीचे झगडे केले. त्यात त्यांचा प्रामाणीकपणा किती होता, इतकेच पाहिले पाहिजे. Son is wiser than the father या सनातन नियमाप्रमाणे, आजच्या पिढीचेहि आचारविचार पुढच्या पिढ्या टाकाऊ नि नादान ठरवणारच. हा कालमहात्म्याचा दण्डक नजरेपुढे ठेऊनच प्रतापसिंहाच्या वेळच्या क्षत्रिय ब्राम्हणांच्या झगड्यांकडे आपण पाहिले पाहिजे.
शंकराचार्याचा दरोडेखोर दौरा
सन १८२० साली संकेश्वरच्या मठाचे स्वामी संचारार्थ निघाले. त्यांचा परिवार मोठा, तसाच खर्चहि दांडगा, शिवाय स्वामीच्या छबिन्याबरोबर भटकले म्हणजे फुकट पुडीची चमचमीत सोय व्हायची, म्हणून शेकडो ऐतखाऊ भटें गांवोगांव पेण्ढाऱ्यासारखी चिकटलेली असायची, ज्या गावातून स्वामी जातील, तेथल्या नि आजूबाजूच्या गावांतून रयतेने भरपूर दक्षणा दिली पाहिजे, अशी वहिवाट. दक्षणा भक्तिभावाच्या मापाने मोजून वसूल केली. तर स्वामीच्या लटांबराचा खर्च भागत नसे. तेव्हा राजकीय करवसुलीच्या दमदाटीने पैसा गोळा करण्यासाठी, रामोशी मांग बेरड वगैरे लोक पदरी ठेवून, लोकांवर बेशक जुलूम जबरदस्ती करण्यात येत असे. फार काय, पण दौरा व्हायच्या प्रदेशातल्या दक्षणेचे लिलावही स्वामी करीत असत. त्यामुळे शंकराचार्याचा संचार म्हणजे रयतेला महामारीचा फेरा वाटायचा.
महाराजांच्या हद्दीत ठिकठिकाणी ही संभावीत धार्मिक लूटमार चालू झाल्याच्या रयतेच्या तक्रारी येतांच रसिदंड ग्रँटने प्रतापसिंहाच्या कानावर ही गोष्ट घातली. त्याने "लोकांकडून सक्तीने दक्षणावसुली करू नका. केल्यास आम्हाला त्याची दाद घेणे प्राप्त. मग अवमानाची जबाबदारी स्वामीवर," असा स्पष्ट हुकुमाचा खलिता स्वामीकडे पाठविला. आजवर एकाहि राजाने शंकराचार्याला असा दणदणीत दम भरला नव्हता. स्वामी नि त्यांच्या अवती भवती असणाऱ्या कारभाऱ्यादि बामणांची माथी भडकून गेली. पण राजसत्तेपुढे करतात काय! दक्षणा देण्यापायत दरबारची दौण्डी गावोगाव ठणाणल्यामुळे, रयतेनेहि हात आखडता घेतला. अर्थात् लिलाववाले हात चोळीत बसले!
स्वामीची स्वारी माहुलीला आली. स्वराज्यात शंकराचार्य आले म्हणजे आजवरचे छत्रपति त्यांना अगत्याने सामोरे जाऊन त्यांचा सत्कार करायचे आणि पायावर डोकी ठेवून आशीर्वाद मागायचे. चारपाच दिवस माहुलीला येऊन झाले तरी छत्रपति दर्शनाला येण्याचा काही रंग दिसेना. तेव्हा धर्माधिकाराचा तोरा बाजूला ठेवून स्वामीनी “आपण सज्जन हिंदू आहात, दर्शनास येऊन राजधानीला येण्याचे निमंत्रण द्यावे नि घेऊनहि जावे." अशी चिठ्ठी पाठवली. स्वामीबरोबर नागो देवराव नावाचे एक वाईचे जडीबुट्टीचे धंदेबाज दुवा होते, ते चिठ्ठी घेऊन आले. जबाबाशिवाय हात हलवीत परत गेले. महाराजानी आपली दखल घ्यावी, यासाठी स्वामीनी नि त्यांच्या सातारकर भट भगतानी खूप धडपड केली. वशिल्याचे सुरूंग लाऊन पाहिले. पण व्यर्थ. अखेर शंकराचार्यच स्वतः उठून सातार्याला आले आणि ठकारांच्या वाड्यात छावणीचा मुकाम ठोकला. भटाबामणांच्या पाद्यपूजा होऊ लागल्या. महाराजानी स्वामीकडे रोजच्या रोज शिष्याचे लागेल ते सामान बिनचूक पाठविण्याचा मात्र बंदोबस्त केला. या पाद्यपूजेत वेदोक्त नि पुराणोक्त असे भेद असत. ब्राम्हणांकडची पूजाच तेवढी वेदोक्त, बाकीची तमाम हिंदू जनता शूद्र, तेव्हा त्यांची पूजा पुराणोक्त.
‘कलींत क्षत्रिय नाहीत,’ तेव्हा कायस्थ प्रभू आणि मराठे हे क्षत्रिय नव्हत, या मुद्यावर चिंतामणराव सांगलीवर, थत्ते प्रभृति चित्पावनानी ग्रामण्यांचा जो ७-८ वर्षे घुडगूस घातला, त्याचा तपशील येथे देण्याचे कारण नाही. कारण या विषयावर स्वतंत्र पुस्तके प्रसिद्ध (ठाकरे कृत ‘ग्रामण्यांचा इतिहास’ के. प्रो. डोंगरे कृत ‘सिद्धांत विजय’ वगैरे.) झालेली आहेत. येथे फक्त धार्मिक मुखवट्याखालच्या राजकारणी चुरशीत चित्पावन आणि इतरांच्या झटापटी कशा झाल्या. एवढेच दाखविणार आहे.
मराठे आणि कायस्थ प्रभू क्षत्रिय का शूद्र, हा वाद शिवाजीच्या वेळेपासून होता. प्रत्येक ग्रामण्याच्या वेळीं शंकराचार्यासारख्यानी ते क्षत्रिय असे निर्णय दिलेले असूनहि, वरचेवर या तंट्याचे मूळ उकरून काढण्याची भटांची खोड काल परवाच्या इतिहास संशोधक विश्वनाथपंत राजवाडापर्यन्त सुटलेली नव्हती. स्वजातीचे वर्चस्व मिरवण्यासाठी प्रतिपक्षाला जेर करण्याचे मार्ग दोन- (१) शरीरनाश आणि (२) नीच जातीत समावेश. ब्राम्हणाना पहिला मार्ग शक्यच नव्हता. तेव्हा धर्मनिर्णयाची निस्संदिग्ध सत्ता हाती असल्यामुळे, त्यानी यच्चावत ब्राम्हणेतराना उपनयनाचा नकार देऊन, कोट्यवधि क्षत्रियांची शूद्रत्वात हकालपट्टी केली. (या मुद्याची सांगोपांग चर्चा डॉ. आंबेडकर यानी इंग्रेजीत लिहिलेल्या Who were the Shudras? या ग्रंथात केलेली अगत्य पहावी.) म्हणजे, आत्मवर्चस्वासाठी ब्राम्हणानी त्याना शूद्र ठरविले, तरी क्षात्रकर्माची त्यांची परंपरा थांबली नाहीच. ती अखंड अविच्छिन्न आणि वंशपरंपरेने चालूच होती.
शिवाजीचे कर्म जरी क्षत्रियाचे, तरी भटांच्या जानव्याच्या वर्माने तो शूद्र. कारण भटांकडून त्याचा उपनयन संस्कार झालेला नव्हता. अर्थात् क्षत्रियाचे कर्म करीत असतानाहि आम्हाला भटाग्रामणानी शूद्र म्हणून हिणवावे, पराक्रमानी आम्ही सर्वश्रेष्ठ असताहि हिंदू समाज व्यवस्थेच्या खालच्या थरावर आम्हाला लेखावे, लौकिकात आमचा सामाजीक दर्जा क्षुद्र नि हिणकस ठरविण्याचा अट्टहास व्हावा, याची मानी क्षत्रियाना चीड येणे सहाजीक होते. या चिडीतूनच ग्रामण्यांचे तंटे निघाले, हिंदू समाज संघटनेचा बोजवारा उडाला, आणि त्यांचे महापाप ब्राम्हण समाजांच्या माथ्यावर कायमचे बसले. ते चालू घडीलाहि त्याना निपटून टाकता येत नाही. सध्या हिंदू संघटनाची मोठी हिरीरीची चळवळ चालू आहे. पण जोवर ती ब्राम्हण समाजांतले लोक चालवीत आहेत, तोंवर त्यांच्या हेतूंच्या शुद्धतेची एकाहि ब्राम्हणेतराला कधीहि खात्री पटायची नाही. ग्रामण्यांच्या धुडगुसाने हिंदू समाजात ब्राम्हणानाच आज अस्पृश्यांप्रमाणे बाजूला निपटून पडण्याचा प्रसंग आलेला आहे.
शिवाजीच्या वेळी त्याच्या क्षत्रियत्वाला नि राजाभिषेकाच्या योजनेला आक्षेप घेणारे ब्राम्हण देशस्थ होते. `कलींत क्षत्रिय नाहीत.’ या परंपरेने पढविलेल्या सूत्रावर त्यांचा प्रामाणिक विश्वास होता. त्यात राजकारणी नि स्वार्थी चुरस नव्हती असे मात्र नव्हे. शिवाजीने काशीहून गागाभट्टाला आणले, तरी त्यालाहि साष्टांग थापटून थोपटून सरळ करावा लागला, तेव्हा तो वैदिक राजाभिषेकाला तयार झाला, प्रतापसिंहाच्या कारकीर्दीतल्या वादात भटांच्या धर्माभिमानापेक्षा, त्यांची राजाविषयी राजकारणी चुरस विशेष होती. हा मुद्दा लक्षांत ठेवण्यासारखा आहे. पेशवाई रसातळाला गेल्यामुळे तमाम हिंदू समाजावर हिटलरशाही गाजविणारी आपली चित्पावनांची राजसत्ता आणि राज्यसत्ता ठार झाली, आणि मराठ्या छत्रपतीचे राज्य मात्र टिकले. याचा चित्पावनमात्राला विषाद वाटून, संतापाने मस्तक भणाणावे, यात अनैसर्गिक असे काहीच नव्हते.
नानासाहेब पेशवा होईपर्यन्त मराठी हिंदू समाजांत चित्पावनांचे स्थान फार खालच्या दर्जाचे होते. जुने देशस्थ कऱ्हाड्यादि महाराष्ट्र ब्राम्हण त्याना पंक्तीलाहि घेत नसत. सत्तेच्या जोरावर नानासाहेबाने अनेक चित्पावनेतर ब्राम्हणांच्या मुलींशी विवाह करून, आपल्या जातीला यच्चायत मराठी ब्राम्हणवर्गात सर्वश्रेष्ठत्वाचा दर्जा दिला. राज्यसत्ता हाती आल्यावर काय हवा तो चमत्कार घडवता येतो! पण या चमत्कारामुळेच इतर समाज चित्पावनांच्या धार्मिक नि सामाजीक शिरजोरीकडे चमत्कारिक नजरेने नि भावनेने पाहू लागले. आजहि ब्राम्हण संघटनेचे खूळ निघाले आहे. तरी चित्पावनेतर ब्राम्हण समाज चित्पावनांकडे तिरप्या नजरने पाहून, त्यांच्या संबंधापासून चार हात दूर रहाण्याची लगबग करतात, हा चमत्कार विचार करण्यासारखा नाही का? आंग्रेजी सत्तेविरुद्ध हिंदी लोकांच्या मनांत जो कमाल कडवा तिटकारा निर्माण झालेला आहे, तितकाच प्रतापसिंहाच्या वेळी चित्पावनी सत्ता नि चित्पावन समाजाविषयी तमाम महाराष्ट्रात फैलावलेला होता.
सातारला आलेल्या संकेश्वरच्या शंकराचार्यानी पूर्वापार चालत आलेल्या प्रघातानुरूप, बळवंतराव मल्हार चिटणीसाच्या घरी वेदोक्त पाद्यपूजा घेतली आणि सहपरिवार भोजन केलेले पहाताच बाळाजीपंत नातूने एकदम ग्रामण्याची चूड पेटविली. नागो देवरावाने वाईच्या भटाना चिथावून उठविले. निळकंठ शास्त्री थत्ते (नातूचा व्याही) याने सांगलीच्या चिंतामणराव पटवर्धनाला भडकऊन उठवले. सातारा पुण्याकडला एकजात चित्पावन धर्म बुडाला, ब्राम्हण्याचे शंकराचार्याने पाटोळे केले अशा आरोळ्या मारीत सुटला. प्रतापसिंहाच्या दण्डुक्याला बाचकूनच या शूद्र प्रभूकडची पाद्यपूजा स्वामीनी घेतली, असा अर्थ बसऊन, छत्रपति, चिटणीस, मराठे आणि कायस्थ प्रभू समाज याना चित्पावन मंडळी राजरोस शिव्यागाळी करू लागली. बखरीच्या निमित्ताने ग्रांटने चिटणिसाला आपल्या रेसिडेन्सी कचेरीतच कामाला मागवून घेतले असल्यामुळे तेथे रोजच्यारोज चिटणिसाच्या नि नातू, आबा जोशी, थत्ते यांच्या गरमागरम वादविवादाच्या कटकटी चालू झाल्या. इतक्यात ग्रांटची बदली झाली. तेव्हा त्याने या कटकटींचा मूळ कलिपुरुष जो नातू त्यालाहि पुण्यास बदली करून नेले. अशाने तरी हा नसता वाद संपेल, अशी ग्रांटची आशा.
पण नातू पडला निश्चयाचा महामेरू. त्याने चिंतामणराव पटवर्धनाला `श्रीमंतांच्या मागे आता ब्राम्हण धर्माचे वाली आपणच.` असे महत्व देऊन उठवले, त्याने शंकराचार्याला पुण्याला बोलावून जाब विचारला. ३-४ वर्षे ग्रामण्याची मोठी दंगल उडाली. कायस्थ प्रभू आणि चित्पावन यांच्यात सोडतोंडी, लेखा लेखी आणि मारामारीसुद्धा अखंड चालली. चिंतामणराव इतकेच करून स्वस्थ बसला नाही. त्याने सांगलीला नवीन धर्मग्रंथ लिहून काढण्याचा एक कारखानाच काढला. शेकडो चित्पावन धर्मवीर लेखक म्हणून खपू लागले. `कायस्थ प्रभू हे व्यभिचारोत्पन्न शूद्राधम आहेत, मराठे शूद्र आहेत, प्रतापसिंह हा राजा हिंदूच नये. अशा संतापजनक शब्दानी, बरबटलेले हजारो जाहीरनामे लिहून ते शेकडो गांवांत ठळक ठिकाणी चिकटविण्याची आणि लोकाना मोठ्याने याचून दाखविण्याची व्यवस्था केली.
पुण्यात ग्रामण्याचा अखेर बोजवारा वाजला आणि शंकराचार्यानी ‘आपल्यावर नातू नि सांगलीकर यानी बळजबरी करून त्याना हवे ते लिहून घेतल्याची` घोषणा केली आणि कायस्थांच्या बाजूने निर्णय देऊन नातू थते जोशी कंपूला फजित केले. मग काय विचारता! आग्रही भटांच्या अंगाचा तिळपापड उडाला, पुण्याचे राघवाचार्य शास्त्री प्रभूंच्या वतीने भांडत होते. त्यानी चिंतामणरावाच्या (अ)धर्म ग्रंथलेखनाचा आणि खोडसाळ जाहीरनाम्यांचा निषेध करणारे सणसणीत पत्रक काढले आणि ते शंकराचार्यांकडे आणि सर्वत्र पाठवून दिले. याच वेळी दिसेम्बर १८२६) आबा जोशी (रेसिडेन्सीतला कारकून) याने ब्रिग्जच्या कानाला या पत्रक प्रसाराचा विपर्यासी चावा घेतला आणि सांगितले की ‘साताऱ्याहून संकेश्वर, सांगली, कोल्हापूर इकडे काही मंडळींची रात्रंदिवस सारखी जा ये चालू आहे, यावरून महाराज तिकडे काहीतरी गुप्त पत्रव्यवहार करून, तहनाम्याच्या कलमाचा भंग करीत असावे, तर याचा बंदोबस्त पहावा.’ याच वेळी ब्रिग्जची बदली झाली आणि कर्नल रॉबर्टसन आला. ब्रिग्जला भटांच्या चळवळीचे मर्म माहीत होते. पण ते नव्या रॉबर्टसनला कशाने असणार? म्हणून आबा जोशाने तीच बातमी चांगली भरदार तिखटमीट लावून रॉबर्टसनला कळविली. ग्रामण्याने काही जमले नाही, तर राजकारणी कारस्थाने करून तरी प्रतापसिंहाला छळण्याचा नातू कंपूचा निर्धार दिसून आला.
कायस्थ प्रभूंचा स्वयंनिर्णय
"धार्मिक बाबतीत आमचे आम्ही मुखत्यार, अमूक करू नका नि तमूक करू नका सांगणारे हे ब्राम्हण कोण? आजवर चालत आल्याप्रमाणे उपनयन विवाह वगैरे विधि आमचे आम्ही वैदिक विधीने करणार, ब्राम्हणांची आम्हाला जरूर नाही." असा बळवंतराय मल्हारने निर्णय घेतला. स्वता अग्निहोत्राची दीक्षा घेतली आणि ठिकठिकाणच्या जातिबांधवानी ब्राम्हणाना बहिष्कार घालून, स्वता वैदिक तीन कर्मे करावी, अशी पत्रे रवाना केली. पुणे सातारा येथे ग्रामण्याच्या दंगलीमुळे खोळंबलेली शेकडो लग्ने नि मुंजी कायस्थ प्रभू आचार्यानी स्वता लावल्या. हे तर आगीतच तेल पडले! काही ब्राम्हणानी याबद्दल महाराजाकडे तक्रार केली. `जातिधर्मात ज्याचे ते मुखत्यार’, असा त्यानी स्पष्ट जबाब दिला. महाराजांच्या पाठबळावरच हीं कायस्थें मगरूर झाली आहेत, तेव्हा या छत्रपतीचाच काटा काढल्याशिवाय ब्राम्हण्य नि ब्राम्हण यांचा तरणोपाय नाही, असा निर्धार मातृकंपूने केला. सांगलीकर चिंतामणरावाने अस्तन्या वर सारल्या. जुन्या ग्रंथांत खोडाखोड, घालघुसड, नवीन स्मृति लिहिणे, कायस्थ मराठे जिनगर सोनार इत्यादींना शूद्रातिशूद्र ठरविणारे जाहीरनामे गावोगाव फैलावणे वगैरे कामे जोरात चाललीच होती.
गवर्नरच्या छावणीवर भटांचा मोर्चा
१८२७ आक्टोबर अखेर एलफिन्स्टन गेला आणि सर जॉन मालकम मुंबईचा गवर्नर झाला. तो सातार्यास महाराजांच्या भेटीला येणार, याची बातमी ठेवून सातारा, सांगली, वाई वगैरे आपल्या खटपटींच्या केन्द्रांच्या ठिकाणी नातूने भडाभड पत्रे रवाना केली आणि कळविले की, ‘आपला सांगलीच्या ग्रंथाचा खटाटोप आपल्याच अंगावर आला. शंकराचार्य स्वामीने तोंडघशी पाडले. असो. लवकरच मुंबईचे मुख्य सातार्यास येणार आहेत. या संधीत बाई वगैरे समस्त ठिकाणची हजार दोन हजार ब्राम्हण मंडळी जमवून, साहेबाच्या छावणीला वेढा द्यावा ‘शूद्रधर्म परभू’ने अग्निहोत्र घेतले, महाराजाच्या मुस्तपन्यामुळे असे होत आहे, महाराज ब्राम्हणांची दाद घेत नाहीत, आमचा सारखा छळ चालला आहे. साहेब बहादुरानी बंदोबस्त करावा, अशी फिर्याद साहेबापुढे मांडा.’ ‘‘हा येक बेत. दुसरा मनसुबा ब्राम्हणानी जमा होऊन सदरी लिहिल्याप्रमाणे वागणुकेचे साहेबाचे जाहिरण्यात आणून आपले वाड्यावर (कोणाच्या? महाराजाच्या का चिटणिसाच्या?) चालून घेऊन मारामारी करून अबरू घ्यावी, त्यांत जे जाया होतील ते होतील, असाहि निग्रह करावा.’’
(समोरच्या पक्षाकडून पराभव झाला. आणखी बाद करण्याची ताकद संपुष्टात आली. वादाच्या मुद्यांचे दिवाळे वाजले, म्हणजे अखेर मारामारीची गावगुंडी करायची हा पुण्याच्या बामणांचा वैदिक धर्म, परवा पांडुरंग गोपाळ रानडे या इतिहास-भास्कराला आहिताग्नि राजवाडे मंदिरात ठार मारण्याच्या बेताने केलेल्या हाणामारीपर्यन्त अखंड चाललेला पाहून, वांशिक परंपरा तत्वाचे रहस्य किती अगाध आहे. याचा अचंबा वाटतो. सारी दुनिया बदलली तरी पुण्याची नाना नातूची परंपरा जशाची तशी कायम, हा केवढा बरे चमत्कार!)
नातूच्या या पत्राने वाई, सांगली, सातारा, पुणे येथील भटसेना पळ्या पंचपात्री खडबडवीत थरारून उठली. मालकम साहेबाचा मुक्काम कोरेगाव तालुक्यातल्या तांदुळवाडी गांवीं आल्याचे समजताच, चिंतामणराव सांगलीकराच्या पुढारपणाखाली १० हजार ब्राम्हणांचा जमाव मोठमोठ्याने आरडाओरडा आक्रोश करीत छावणीच्या तंबूला गराडा देऊन उभा राहिला. त्यावेळी मालकाला भेटायला गेलेला रसिदंट रॉबर्टसनहि तेथे होता. बाहेर भटांच्या घोषवाक्यांचा गोंगाट चालला असताना, रॉबर्टसनने या भटी चळवळीचा इत्यर्थ थोडक्यात मालकमला सांगितला. मालकमच्या हुजर्याने बाहेर येऊन, तुमच्या चारपाच पुढाऱ्याना साहेब आत बोलावताहेत असे सांगितल्यावरून चिंतामणराव थत्ते, भडकमकर, आबा जोशी वगैरे महात्मे आत गेले. तावातावाने हातवारे करून ते म्हणाले, "साहेब, तुमच्या राज्यात आम्ही ब्राम्हणांचा धर्म उच्छेद होऊ लागला. कोणी शास्ताच उरला नाही. ते परभूलोक अहो, ते शूद्र! ते खुशाल वैदिक पद्धतीने धर्मकृत्ये करताहेत. मुंजी लावताहेत, स्वतः अग्निहोत्र घेताहेत, आणि तो राजा प्रतापसिंह त्याना फूस देत आहे. आमचे श्रीमंत होते तोवर असे करण्याची परभांची छातीच नव्हती. साहेब बहादुरानी तातडीने बंदोबस्त केला नाही. तर ब्राम्हणधर्म रसातळाला जाणार आणि त्याचे खापर तुमच्या माथ्यावर फुटणार’’
मालकम- राजा प्रतापसिंह धर्माभिमानी हिंदू आहे. त्याच्याकडे जा.
एक पुढारी- जो ब्राम्हणांचा धर्म जुमानीत नाही तो कसचा हिंदू? तो आहे शूद्र. शूद्राला ब्राम्हणांची काय पर्वा? आणि ब्राम्हण धर्माविषयी निर्णय देण्याचा त्या शूद्राला अधिकार. तरी काय? जागोजाग हा मराठा शूद्र राजा आम्हा ब्राम्हणांचा छळ करीत आहे. साहेबानीच आमचा बंदोबस्त केला पाहिजे,
मालकम- हिंदूंच्या धर्माच्या भानगडीत आम्ही इंग्रजलोक हात घालणार नाही, असा आमचा जाहीरनामा तुम्हाला माहीत आहे ना? शिवाय आम्हाला तुमच्या धर्मातले काय समजते? राजा प्रतापसिंहाकडे जायचे नसेल तर पंडितांच्या लवादापुढे जा, चले जाव यहांसे.
काय आश्चर्य आहे पहा. प्रतापसिंह `शूद्र’ म्हणून त्याला ब्राम्हणी धर्मात निर्णय देण्याचा अधिकार नाही, असे म्हणणारे हे वेदाभिमानी शहाणे ‘न हिंदुर्नयवन’ अशा आंग्रजांकडे धर्मनिर्णय मागतात! पण आश्चर्य ते कशाचे? त्याना धर्मनिर्णय नकोच होता. कसेहि करून कायस्थ प्रभूंच्या पक्षपाती छत्रपतीला गोत्यात आणायचा होता. मुंबई कलकत्ता विलायतेच्या अधिकाऱ्यांच्या गौरवाला पात्र झालेल्या प्रतापसिंहाला नि त्याच्या सिंहासनाला उखडून टाकायचा त्यांचा हेतु होता. ५०-६० वर्षांपूर्वी दक्षिणी हिन्दूच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेत ज्याना कसलेच निश्चित स्थान नव्हते आणि देशस्थ कराडआदि महाराष्ट्र ब्राम्हणांच्या पंक्तीला बसण्याची ज्यांची पात्रता नव्हती, त्या चित्पावनानी इरसाल ब्राम्हण्याचा एवढा दिमाख मिरवावा या दांभिकपणामागील त्याच्या कपटनीतीचा त्या वेळी कोणालाच थांग लागला नाही.
रेसिदंट रॉबर्टसन काही वर्षांनी विलायतेस गेल्यावर कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाचा मेम्बर झाला. रंगो बापूजी प्रतापसिंहाचा कज्जा तेथे लढवीत असता, बोर्डापुढे ता. १६ जुलै१८४१ रोजी याच भटी मोर्चाचा संदर्भ दर्शवून रॉबर्टसन म्हणाला.- This shows that the Brahmins had been unceasing in their endeavors to injure the Raja. They had even gone so far as to declare that he was no Hindu and Chintaman Row of Sangli, a neighboring Brahmin chief, had circulated a manifesto all over Hindustan, saying that he was an enemy to the national faith.
(भावार्थ:- यावरून असे दिसून येईल की राजाचा सर्वस्वी घात करण्याच्या कामात ब्राम्हणांचे प्रयत्न जारी चालू होते. फार काय पण, ‘हा राजा हिंदूच नव्हे` असे प्रतिपादनकरण्यापर्यन्त त्यांची मजल गेली होती. आणि शेजारचा ब्राम्हण जहागीरदार सांगलीचा चिंतामणराव याने तर सगळ्या हिंदुस्थानभर एक जाहीरनामा काढून पुकारा केला की हा राजा (प्रतापसिंह) राष्ट्रीय धर्माचा वैरी आहे.)
(पुण्याच्या केसरी पत्राने एक जाहिरनामा वजा अग्रलेख लिहून कै. शाहू छत्रपति करवीरकर यांचा ‘स्वराज्यद्रोही छत्रपति’ म्हणून पुकारा केला होता.)
जनरल रॉबर्टसन पुढे म्हणाला- This was not the first time that the Brahmins had made similar attempts to procure the interference of the British government. I have been thus particular in regard to this case, as it displays how little the parties regarded truth, when the object was to injure or annoy the Raja.
(भावार्थ - ब्रिटीश सरकारने मध्यस्थी करावी म्हणून कोलाहल करण्याचा ब्राम्हणांचा हा काही पहिलाच प्रयत्न नव्हे. या खटल्यात मी विशेष लक्ष देऊन पाहिले आणि ज्याअर्थी त्या ब्राम्हणांचा उद्देश राजाला अपाय करणे, निदान त्याला चिडविणे हा होता, त्याअर्थी त्यांच्या पक्षाला सत्याची कितपत चाड आहे, ते दिसतच आहे.)
मालकमने मोर्चावाल्या १० हजार भटाना वाटाण्याच्या अक्षता लावून परतवले. पण, साहेबाकडे आपली खिचडी शिजली नाही, म्हणून हताश होणारे ते वीर नव्हते. चिंतामणराव पटवर्धन त्यांचे ‘नवे श्रीमंत’ आणि बाळाजीपंत नातू `नाना फडणवीस’. एकापरिस एकमसलती त्यानी अखेर थेट प्रतापसिंहाच्या देवघरावर हल्ला चढविण्याचा मनसुबा केला.
देवळात देवी नि गावभर नायटे
नातू सांगलीकर संप्रदायी ग्रामण्या भटांचा घुडगूस केवळ छत्रपति नि कायस्थ प्रभूंपुरताच नव्हता, त्याची झळ गावोगावच्या शेकडो बामणेतराना आणि चित्पावनं अमान्य बामणानाहि लागली होती. मुंबईचे विख्यात नगरनायक श्रीमंत जगन्नाथ शंकरशेठ हे वाईला तीर्थयात्रेसाठी आले असताना, तेथल्या भटांनी वेदोक्त मंत्रानी कृष्णास्नान करण्याची त्याना मनाई केली. शंकरशेटनी ता. १९ डिसेम्बर १८२६ रोजी पत्र पाठवून प्रतापसिंह महाराजाकडे तक्रार केली. त्यानी ताबडतोब चौकशी करून गुन्हेगार भटांना धरून आणवले आणि अपराधाबद्दल दंड केला. शंकरशेटना योग्य त्या शास्त्रीमंडळींचे सहाय देऊन, त्यांचे कृष्णास्नान पार पाडले. झाले. ब्रम्हमुखीत्पन्न भटाना राजा दंड करतो म्हणजे काय? सर्वत्र हाहाकार उडाला! धर्मच बुडाला!
प्रकरण १३ वे
प्रतापसिंहाचे ब्राह्मणांना आव्हान
हे असे का झाले?
राष्ट्राला स्वास्थ नि शांति मिळाली. त्याचा मुलुखगिरीचा बाहेरचा व्याप बंद पडला आपले घर शेतवाडी धंदा बरा कीं आपण बरे असली संकुचित संसारी स्थिति आली. म्हणजे समाजनीति, धर्म, देवदेवळे, रूढी यांचे पोकळ थेर माजविण्याचे उपद्व्याप लोकांना सुचतात. शहरपेक्षा गांवांत नि गावापेक्षा खेड्यांत कज्जे तंटे भांडणे फिर्यादी आर्यादी यांचा धुमाकूळ फार जोरात चालतो. कारण, तेथल्या लोकाना फुरसद फार आणि उद्योग काहीच नाही. कंपनी सरकारने महाराष्ट्राच्या राजकारणाचा संसार आटोपल्यावर आमची मुलुखगिरी कायमची बंद पडली. ठरावीक तारखेला पगार घेऊन निवांतपणाने संसार करणार्या नोकरमान्यांचा वर्ग वाढत गेला. सदानकदा ज्या मऱ्हाठ्या जवानांची घोडयावर मांड, कंबरेला तलवार, पाठीवर बाल नि हातात भाला, ते सारे आता घरोघर माशा मारीत बसले.
ब्राम्हण मराठे, कायस्थ प्रभू, तमाम एकूणेक समाजातले असामी आता आपल्या पायापुरते पाहू लागले. त्यांची जेतृत्वाची भावना नि स्वराज्याचा अभिमान नाहीसा झाला. म्हणून ते सारे समाजसुधारणेच्या वर्चस्व स्थापनेच्या आणि धर्माधिकार-शोधनाच्या ऐदी फंदात पडले. तू थोर का मी थोर? वेदोक्ताचा अधिकार मला का नसावा? तू कोण टिकोजी मला तो नाकारणार? ब्राम्हण जर ब्रम्हदेवाच्या तोंडापासून आपली उत्पत्ति सांगतात, तर आम्ही मराठे थेट चंद्र सूर्याच्या रेताचे अस्सल वंशज! मराठे मंडळी तर सप्त कुळी नि शहाण्णव कुळ्यांच्या वादांतच रंगले. कायस्थ प्रभूंची हीच अवस्था. जोवर मुलुखगिरी लढाया राजकारणे त्यांच्या मागे अखंड लागलेली होती, तोंवर आपण क्षत्रिय का शूद्र यांचा शोध घेण्याची त्याना शुद्धहि नव्हती. पण तो व्याप खलास झाल्यावर, क्षत्रियत्वाच्या आज्ञापत्रांसाठी शंकराचार्यांच्या नि शास्त्रीपंडितांच्या खडावावर लाखो रुपयांचे शेण ते थापू लागले. त्याना घरेदारे शेतवाड्या इनाम देऊ लागले.
मराठामंडळ खडबडले
चित्पावन आणि कायस्थ प्रभूंच्या ग्रामण्याच्या तंट्यात, ब्राम्हणानी `कलींत क्षत्रिय नाहीत` या मुद्यावर विशेष जोर दिला आणि त्याचा सगळीकडे जोराने पुकाराहि केला. सातार्याचे ब्राम्हणानी तर राजवाड्यातल्या पुजारी भटाना वेदोक्त पूजाअर्चा नि विधि करण्याची सक्त मनाई केली. मराठे लोकानीहि आपल्या पंचांच्या सभा भरवून, महाराजांकडे तक्रारी नेल्या की ‘कलींत क्षत्रिय नाहीत’ ही ब्राम्हणांची घोषणा आम्हाला बदनामीकारक वाटते. सरकारने त्याचा बंदोबस्त करावा वेदोक्तबंदींची घोरपड आपल्या देवघरातच घुसल्यामुळे, प्रतापसिंहाने हा वाद धसाला लावण्यासाठी कंबर कसली. राज्यकारभाराची व्यवस्था आता सुरळीत लागली होती. ग्रांट आणि ब्रिग्ज या दोन रसिदंटांचे थेट बोर्डापर्यंत अनुकूल अभिप्राय गेले होते. तेव्हा छत्रपतीसकट अखिल मराठ्याना ‘शूद्र’ म्हणून हिणविणाऱ्या भटाबामणांची खोड मोडण्याचा प्रतापसिंहाने निश्चय केला. यासाठी तंजावर, म्हैसूर, कोल्हापूर, नागपूर आणि विशेषतः उदेपूर येथील आपल्या नातलग (?) राजघराण्यांत कोणत्या पद्धतीने धर्माचार होतात, याची चौकशी करण्यासाठी रसिदंटामार्फत पत्रे रवाना केली. उदेपूरच्या राजघराण्याशी भोसल्यांच्या घराण्याचा वांशिक संबंध
(राजाभिषेकाची योजना तडीला नेण्यासाठी, त्यावेळचे अखिल हिंदुस्थानात पट्टीचे क्षत्रिय म्हणून गाजलेले जे उदेपूरचे रजपूत घराणे त्याच्याशी भोसल्यांच्या वंशावळीचा धागा नेऊन भिडविण्याची मुत्सदगिरीची कामगिरी बाळाजी आवजीने केली. यांशिक संशोधनाचे शास्त्र आताइतके त्या वेळी कोणाच्या ध्यानीमनीहि नसल्यामुळे, चिटणिसाची ही चिटणिसी वेदशास्त्रसंपन्न ब्राम्हणानाहि चारीमुंडे चीत करायला उपयोगी पडली. रजपूत थोर पराक्रमी खरे. त्यानीहि आपल्या पूर्वजांचे धागेदोरे थेट राम कृष्णांपर्यंत नेऊन भिडविले होते. पण ही सारी फार जुनी अशी ब्राम्हणांचीच कारवायी होती. इण्डो-आर्य समाज संघटनेत, बौद्धधर्माच्या ऱ्हासकाळीच, क्षत्रिय म्हणून ‘रजपूत’ ही नवीन जात चमकू लागली. त्यापूर्वी हिच्या कुळामुळांचा काहीच पत्ता नव्हता. संशोधनाने आता स्पष्ट सिद्ध झालेले आहे की हिंदुस्थानावर स्वारी करायला आलेल्या नि पुढे मध्यहिंदुस्थानात वसति करून राहिलेल्या हूणाना आणि सिथियनाना, त्यांच्या शौर्यवीर्यादि गुणांवरून, बौद्धधर्म-द्वेष्ट्या वैदिक ब्राम्हणानी व्रात्यस्तोमासारखाच काही अग्निसाक्षिक विधि करून, बौद्धांची नि त्यांच्या धर्माची हिंदुस्थानातून हकालपट्टी करण्यासाठी, आर्य धर्मात सामील करून घेतले आणि त्याना `क्षत्रिय’ संज्ञा दिली. म्हणूनच रजपुतांना ‘अग्निकुल क्षत्रिय` असे म्हणतात. आर्यधर्मात प्रविष्ठ झाल्यानंतर इतर आर्यजनांत आपल्या मूळच्या कुळामुळांचा पत्ता लागू नये, म्हणून या अग्निकुल रजपूत क्षत्रियांनी आपल्या वंशाची मुळे भारतीय प्राचीन थोर आर्य क्षत्रिय राजघराण्यांच्या वंशावळीत नेऊन भिडविली.
प्रतापसिंहाचा हा खटाटोप चालला असतानाच, चिंतामणराव सांगलीकराने शूद्रत्वाला संमति देणाऱ्या शिवाजी संभाजी शाहू यांच्या बनावट कैफियती तयार करून त्यांचा गवगया सगळीकडे केला. बनावट बखरी याद्या पत्रे नि शंकराचार्यांची आज्ञापत्रें यांची भेण्डोळीच्या भेण्डोळी पटवर्धन फॅक्टरीतून बाहेर पडू लागली. खोटे शिक्के करणारे ब्राम्हण कारागीरहि शेण्ड्या झटकून पुढे सरसावले. प्रतापसिंहाच्या उच्चाटनासाठी पुढे या कारागिरांचा फार उपयोग झाला. शिवाय रसिदंटाच्या हापीसात बसून पुण्याहून येतील त्या नातूच्या सूचना नि इषारे लक्षात घेऊन, त्याप्रमाणे राजाला राजकारणी पेचांत पकडण्याच्या कारवाया करणारे जोशी भडकमकर किये मंडळ डोळ्यांत तेल घालून किटाळे निर्माण करण्यात गढलेले होतेच.
अखिल भारतीय पंडितांची सभा
प्रतापसिंहाच्या संग्रही मराठ्यांच्या क्षत्रियत्वाचा पुरस्कार करणारे कागदपत्र कितीहि असले, आणि त्यांच्या जोडीला उदेपुरादि ठिकाणाहून वैदिक आचारांची परंपरा सिद्ध करणारे आणखी कितीहि रूमाल आले, तरी पिसाटाप्रमाणे खवळलेल्या दक्षिणी ब्राम्हणांची समजूत तेवढ्याने होणे शक्य नाही.असा पुरा विचार करून, प्रतापसिंहाने अखिल भारतीय शास्त्रि पंडितांची एक महासभा वादग्रस्त मुद्यांचा अखेर जाहीर निर्णय देण्यासाठी बोलावण्याचा बेत केला. रसिदंटाच्या सल्ल्याने सगळीकडे मोठमोठ्या पंडिताना निमंत्रणे गेली. तुमचेहि कोणकोण शास्त्री पंडीत बोलवायचे असतील ते बोलावा, पंडितांची महासभा जो निर्णय देईल तो दोघा पक्षांनी बिनशर्त मान्य करावा, असे महाराजानी ब्राम्हणाना कळविले. निमंत्रणाच्या पत्रासोबत एक सूचनाहि सर्वांना पाठविण्यात आली. ती अशी :-
"शास्त्री मंडळापैकी शास्त्र जाणत्यास कोणी शास्त्रनिर्णय विचारिला आसता यथार्थ सांगावा लोभाने किंवा भयाने किंवा पुसणाराचे मर्जीनरूप सांगू नये. ज्या जातीस जे विहित य बहुत ग्रंथाची समते असा सांगावा व याप्रमाणे आपण पाहून दुसरे विद्वानाचे सभेत घ्यावे. या उपर विपरीत शास्त्रार्थ सांगितला आसता त्यास निर्णयाचे सभेत बोलाऊ नये व त्याचा शास्त्रार्थ ऐकू नये, असे लोकाची सरकार गरज ठेवणार नाही. याप्रमाणे जाहीरनामा करविला. ब्राम्हणाने दहशत व भय [बाळगू नये]. महाराजाची मरजी जाईल असे सांगणारे लबाड फितूर [त्यांचे ऐकू नये.]’’
अखेर महासभेचा दिवस उजाडला. [सन १८३०]. आनेगोंदी, अरणी संस्थान, चांद्रायणपट्टण, म्हैसूर, तंजावर, तोलवदेश, चरकल संस्थान, कोच्ची, वेंकीपूर, विद्यानगर आणि महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणाहून शेकडों शास्त्री पंडित सातारला आले. पक्षभेद मनात न आणता महाराजांनी दोहीकडच्या पाहुण्यांची यथायोग्य सरबराई ठेवली. यापूर्वी सातार्यात एवढी मोठी धर्मनिर्णय परिषद कधीच भरली नव्हती. ती पहाण्यासाठी गावोगावचे हजारो लोक आले. मराठा क्षत्रियातर्फे विठ्ठल सखाराम ऊर्फ आबा पारसनीस या चांद्र श्रेणीय कायस्थ प्रभू शास्त्र्याची वादासाठी प्रमुख म्हणून नेमणूक झाली. आबा पारसनीस हे फारशीत तर निपुण होतेच पण संस्कृतांतहि पारंगत होते. त्यांचे दोन शास्त्रांचे अध्ययन झालेले होते, कायस्थ प्रभूना शूद्र ठरविणार्या ब्राम्हण पक्षाने पारसनीसाच्या नेमणुकीला आक्षेप घेतला नाहीं, कारण पारसनीसांची शास्त्री म्हणून कीर्ति चांगलीच झालेली होती. म्हणून जमलेल्या सर्व पंडितानी त्यांचे स्वागत केले, विरुद्ध पक्षाने वेदशास्त्रसंपन्न राघवाचार्य गजेन्द्रगडकर या अत्यंत विद्वान पंडिताला आपल्या तर्फे उभे केले. सातार्याच्या संस्कृत पाठशाळेत दोघा पक्षांचा वाद लेखी पद्धतीने कित्येक दिवस चालला. रोज पूर्वपक्ष उत्तरपक्ष होऊन वाद सारखा रंगत होता.
शेवटी दोनहि बाजू विचारांत घेऊन पंच आपला निकाल देणार तो दिवस उजाडला. प्रेक्षकांची पाठशाळेजवळ तोबा गर्दी उडाली. पुण्यापासून बेळगांवपर्यंतचे हजारो ब्राम्हण निकाल ऐकण्यासाठी आले होते. आपल्या विरुद्ध निकाल देणारांची साधल्यास डोकी फोडून सूड घेण्याची विद्या भटाभिक्षुकाना चांगली अवगत असल्यामुळे, आणि अलिकडे नातूकंपूच्या तशा चिथावण्याहि असल्याचे महाराजाना समजल्यावरून, महाराज स्वतः नागव्या तरवारीने पाठशाळेच्यापुढे बंदोबस्तासाठी फिरत होते. बळवंतराव सेनापति आपली निवडक फौज घेऊन बंदोबस्ताला उभा होताच, शिवाय रसिदंट रॉबर्टसन यानेहि आपले ट्रुप्स रसिडेन्सीजवळ तयारीत ठेवले होते. सरतेशेवटी पंचानी मराठे क्षत्रिय आहेत असा २४ सिद्धांताचा निकाल जाहीर केला आणि आबा पारसनीसांच्या पांडित्याची मोठी वाहवा केली. त्यांतले फक्त ९ निवडक सिद्धांत येथे देतो-
[१] श्रीपरशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रीय करण्याचा प्रयत्न केला तरी केव्हाहीक्षत्रियांचा अभाव झाला नाही.
[२] ज्या क्षत्रियांचा परशुरामाने वध केला नाही, त्यांचे वैदिक कर्म त्याने सोडविले नाहि.
[३] नन्दानंतर क्षत्रियांचे अस्तित्व होते.
[४] सुमित्रानंतर क्षत्रियांचे अस्तित्व होते.
[५] राज्यकर्ता जो राजा त्यास वैदिक मंत्रानी राज्याभिषेक होतो. सबब त्याने तेवढे वैदिक कर्म करावे, व इतर क्षत्रियानी करू नये, असे नाही. तर कोणत्याहि क्षत्रियास वैदिक कर्म विहित आहे.
[६] सातारा, चंदी [तंजावर]. नागपूर व करवीर येथील राजघराण्याचे मूळ एक असून, यांचेकडे ऋग्वेदावरून कर्म चालते. चंदीस अग्नि सिद्ध असून, स्वतः राजे [शिवाजीमहाराज] ब्राम्हणांस अनौकरण देतात व शास्त्राध्ययन करितात. करवीरीहि वेदकर्म चालत आहे.
[७] नर्मदेपलिकडे क्षत्रियांकडे यजुर्वेदावरून कर्म चालते. उदेपुरास अशीच वहिवाट आहे. सातार्यास यजुर्वेदी कर्म महाराजानी सुरू करावे.
[८] क्षत्रियांस मातुलकन्या विवाह वर्ज्य नाही.
[९] क्षत्रियांस स्वज्ञातीत एकपात्री भोजन करण्याची चाल आहे. तरी वैदिक कर्मास बाध येत नाही.
या निर्णयपत्रकावर दोनहि पक्षांतल्या मिळून १९ पंचांच्या सह्या होऊन ही महासभा बरखास्त झाली.
महासभेने निर्णय दिला. तरी तेवढ्याने ‘जे का स्वार्थ परार्थ हानी करण्यास’ एका पायावर उभे अशा नातू सांगलीवर प्रभृति ‘दुर्मति’ बामणांची समजूत होणेच शक्य नव्हते. एकट्या धार्मिक कोलदांडाने काम होत नाहीसे पाहून, त्यांनी आता राजकारणी कटबाजी रचण्याचा बेत केला. खरे पाहिले तर ब्राम्हणांचे धर्मविषयक आक्षेप केव्हाही प्रामाणिक नव्हते. आज नाहीत नि पुढे असणे शक्य नाही. धर्माच्या कळकळीपेक्षा प्रतिपक्षाला समाजाच्या समोर हिणकस क्षूद्र ठरवून, राजकीय क्षेत्रातहि त्याना नालायक ठरविण्याची तळमळ विशेष असते. हे साधण्यासाठी ग्रामण्याचे हत्यार ब्राम्हणानी पूर्वी मनमुराद वापरले, सध्या ब्राम्हण्याला जुन्या बाजारातहि कोणी हातीं धरीत नाही, तर ग्रामण्य ही चीज काय, यांची कोण चौकशी करतो?
प्रतापसिंहाची जाति-सुधारणा
महासभेच्या निर्णयाने प्रतापसिंह एकदम शेफारला. त्याला आपल्या भोसले घराण्याची प्रतिष्ठा अतोनात वाटू लागली. उदेपूरकरानी ‘आम्ही तुम्ही एक’ असा निर्वाळा दिल्यामुळे, स्वताच्या नावामागे तो ‘सिसोदे राजे भोसले’ असे नवे पालुपद जोडू लागला. तमाम मराठ्याना त्याने क्षत्रिय ठरवून घेतले, तरी शिंदे, गायकवाड आणि अक्कलकोटकरयाना तो कमी लेखण्याचा अट्टहास करू लागला. तो त्याना ‘कुणबी’ म्हणू लागला. "आलीकडे कुणबी वगैरे पैकेकरी होऊन या ज्ञातींत फितूर करून बाटवितात. (सोयरिका करतात) हे जाहल्यास धर्म राहणार नाही. हिंदुस्थानात शिंदे वगैरे कुणबी लोक आहेत त्यास ताकीद जाली पाहिजे... गायकवाडाची सोयरीक करू तरी कासीत मात्रागमन केल्याचे पातक." असे त्याचे विचार भडकू लागले. त्यामुळे, मराठा मराठ्यांत वितुष्टाचे विष पसरू लागले.
प्रतापसिंहाने कुणबी ठरविलेल्या मराठ्यांशी सोयरीक करणारावर तो बहिष्काराचा जाहीर पुकारा करू लागला. उदेपूरकरांविषयी त्याला इतका काही पान्हा फुटला की आपली एकुलती एक मुलगी गोजराबाई हिला तिकडचा रजपूत वर शोधण्यासाठी आणि तिकडच्या मुली इकडच्या मराठा युवकाना लग्नात देण्याच्या खटपटीसाठी त्याने हजारो रुपये खर्चून अनेक शास्त्र्याना रजपुतान्यात रवाना केले. फार काय, पण वरनिश्चिती होण्याच्या पूर्वीच त्याने गोजराबाईच्या लग्नात कोणकोणाला काय काय आहेर द्यायचे, कोणाला निमंत्रणे पाठवायची, पाहुण्यांची सरबराई कशी ठेवायची, कोण कोण साहेबाना खास निमंत्रणे पाठवायची, याच्या तपशीलवार याद्याहि तयार केल्या. "या देशचे ब्राम्हणाचा द्वेश कर्माविषयी आहे." म्हणून उदेपुर कर्नाटकातून ब्राम्हण आणविण्याच्या यातायाती तो करू लागला. सारांश, ज्ञातिसुधारणेच्या बाबतीत प्रतापसिंह अलिकडच्या अफगाणीस्तानच्या अमानुल्लासारखा बेफाम भडकत जाऊ लागला. स्वकुळाची थोरवी अट्टाहासाने गाजवू वाजवू लागल्यामुळे, बाकीच्या मराठ्याना त्याच्याविषयी आदर वाटेनासा झाला ते त्याचा मनातल्या मनात तिटकारा करू लागले.
एकदा एक कछवा क्षत्रिय प्रतापसिंहाच्या भेटीला आला. तो गायकवाडाकडे नोकरीला होता. आधी तो त्याची भेटच घेई ना. पुढे भेट घेतली तेव्हा त्या कछव्याने सांगितले, "आमचे घराण्यापैकी कोणी पुरुष चाकरी करिता कोठेहि गेला तरी सातारा महाराज किंवा उदेपूर राणाजी किंवा कछवा राजा या तिहीखेरीज कोठेच मुजरा जमीनीस हात लावून करावयाचा नाही आसा शिरस्ता आहे व घराण्यातील हुकूमहि आहे. मी गायकवाडापासी चाकरीस आहे, परंतु ते कुणबी लोक, सबब रामराम मात्र करितो. मुजरा करीत नाही. आम्हास या लोकानी लाखो रुपये दिले तरी यांची सोयरीक करणार नाही, व यांनी आम्हा लोकांची मुलगी मागितली आसता तलवारीसी प्रसंग पडेल. सरकारची व आमची ज्ञात एकच आहे." इतके सांगताच सिसोदे राजे भोसले प्रतापसिंह महाराज त्याच्यावर निहायत खूष झाले.
त्याला नि त्याच्या बरोबर आलेल्या इसमाला शेला पागोटे नि पंचवीस रुपये इनाम दिले. गायकवाडाच्या पदरचा कोण कुठला एक शिपायी, पण त्यालासुद्धा छत्रपति मुलाखत देतो नि त्याचा सन्मान करतो आणि आम्हा जवळच्या मराठे बांधवाना कुणबी लेखतो. या बातम्या बाहेर फैलावताच अक्कलकोटकर भोसले, गायकवाड, शिंदे वगैरे मंडळी प्रतापसिंहाचा द्वेष करू लागल्यास नवल नाही. अनेक खटपटी केल्या तरी गोजराबाईजोगा वर उदेपूरच्या युवकसंग्रहात मिळे ना. तेव्हा १० दिसेंबर १८३४ रोजी तिचा विवाह यशवंतराव गुजर याशी सातारा येथे थाटात साजरा केला.
या असल्या भानगडीतच प्रतापसिंहाचे लक्ष लागल्यामुळे आणि त्याच्या आजूबाजूचे दिवाण फडणीस चिटणीसादि कारभारी, त्याच फंदात गर्क झाल्यामुळे, आपल्या विरुद्ध बाहेर कसकसल्या कारस्थानांच्या हण्ड्या उकडल्या जात आहेत, याची कोणालाच दाद लागली नाही. १८३२ च्या जानेवारीत रसिदंट रॉबर्टसन गेला आणि त्याच्या जागी कर्नल लॉडविक आला.
प्रकरण १४ वे
नातूकंपूच्या कारस्थानांची उभारणी
सन १८३२ च्या जानेवारीत लाडविक सातार्याला रेसिदंट आला आणि मार्चात लॉर्ड क्लेअर मुंबईचा गवर्नर झाला. या वेळी पुण्याच्या दप्तरांत बाळाजीपंत नातूचा भाव फार धारलेला होता. मुंबईच्या कौंसिलात गवर्नराचे जे गोरे सल्लागार होते, ते कट्टे साम्राज्यवादी पिण्डाचे नातू सांगलीकर मंडळी धार्मिक चढाईच्या बाबतीत पराभूत झाल्यामुळे त्यांच्या संतापाचा पारा विवेकाची नळी फोडून बाहेर पडला. प्रतापसिंहाला राजकारणी चापांत चेचण्याचा त्यानी व्यूह रचला. नातूने मुंबईकर गोर्या सल्लागारांना भेटून, त्याना छत्रपतिविरुद्ध चिथावले. ‘जत आणि सचीव या दोन निपुत्रिक जहागिरदाराना दत्तक घेण्याची परवानगी छत्रपति देत नाही. यात त्याचा हेतू त्या जहागिर्या आपल्या राज्याला जोडून घेण्याचा आहे. अशा सगळ्या जहागिर्या सातार्याला जोडल्या गेल्या, तर थोड्याच दिवसांत हा राजा आंग्रेजाना भारी होईल. तहनाम्याचे कलम संदिग्ध आहे. जहागिरदारांवर आपली हुकमत. हा राजाने बसवलेला अर्थ चुकीचा आहे,’ वगैरे चिथावण्या देऊन, नातूने त्याना रसिदंटाकडे तहनाम्याच्या मुद्यादिषयी खुलासा मागविण्यास लावले. लाडविकने सारे कागदपत्र पाहिले, ग्रांट आणि अलपिष्टन यांच्या वेळच्या वहिवाटीच्या नोंदी तपासल्या आणि महाराजांचाहि विचार घेतला. ‘जहागिरदार हे महाराजांचे कदीम पूर्वीपासूनचे मांडलीक, त्यांवर सत्ता महाराजांची`, असा लाडविकने जबाव पाठविला. गवर्नरचे सेक्रेटरी नि सल्लागार यानी त्यावर विरुद्ध मत देऊन, जहागिरदारांविषयी तहनाम्याचा कलमाचा असा अर्थ लागणेच शक्य नाही. तसा तो लावूच नये, असा अभिप्राय देऊन प्रकरण खास क्लेअर गवर्नरपुढे ठेवले. हे बडेलाट म्हणजे शुद्ध सह्याजीराव असतात. सल्लागार नि सेक्रेटरी सांगतील ते त्याना डोळे मिटून संमत. विशेष खोल पाण्यात जायची त्याना जरूरच काय? गवर्नरने प्रकरणावर ‘याssस’ म्हणून सही ठोकली आणि प्रकरण परत सातार्याला आले.
छत्रपति आणि आंग्रेज यांची भिन्न मनोवृत्ति
या ठिकाणी आपल्याला प्रतापसिंह आणि आंग्रेज अधिकारी यांच्या मनोरचनेतला फरक लक्षात घेणे अगत्याचे आहे. प्रतापसिंहाला वाटे, आपल्या पूर्वजानी कमावलेल्या अफाट राज्यातला एक थोडकासा तुकडाच आपल्याला लाभला. अलपिष्टनादि मंडळीनी थातरमातर करून वचनभंग केला. आंग्रेजाना वाटे की आम्ही प्रतापसिंहाला नवीन राज्य दिले. आंगठाच दाखवला असता तर हा काय करता? अर्थात आमचे त्याच्यावर उपकार आहेत. प्रतापसिंहाला वाटायचे की चला टुकडा तर तुकडा. पण आता पूर्वजांसारखा काहीतरी पराक्रम करावा मऱ्हाठी राज्य राखाये, धर्म वाढवावा नावलौकीक करावा, शक्य तर राज्यादी वाढवावे. पण पुढे पुढे पहातो तो आपल्या जहागीरदारांप्रमाणेच कंपनी सरकार आपल्यालाहि खालच्या मांजरापेक्षा अधिक लेखीत नाही, असे त्याला दिसल्यामुळे, तो मनातल्या मनात चडफडू लागला. ग्रांट, ब्रिग्ज, रॉबर्टसन सारखे रसिदंट आणि अलपिष्टन, मालकमसारखे सभ्य नि कनवाळू गवर्नर राजाच्या पूर्व खानदानीला नि वैभवाला जाणून त्याच्याशी मित्रत्वाने वागत. त्याचा नेहमी गौरव करून त्याला संतुष्ट ठेवीत. पण त्यांच्यामागून जी विलायती मंडळी कारभारावर आली, त्यांना हे मरगठ्याचे राज्य निर्माण करण्यात चूक झाली, आयता सबंध सलग प्रदेश कंपनीच्या हातात आला असता, पूर्वीच्या कच्च्या दिलाच्या अलपिष्टनादिकानी उगाच हातचा सोडला, आता तो कायमचा खालसाच केला पाहिजे, असे वाटू लागले. तशात नातूसारख्याची चिथावणी नि टुमण्या त्यांच्यामागे सारख्या चालू जहागीरदारांविषयी तहनाम्याचे कलम सरळ नि उघड असतां, त्यावर आता गवर्नरानेच आक्षेप घ्यावा तेव्हा काय करायचे? म्हणून महाराजांनी डायरेक्टर बोर्डाकडे या बांध्याचे अपील करण्याची गवर्नरकडे परवानगी मागितली. नशीब की लॉर्ड क्लेअरने ती परवानगी दिली आणि त्याच्यामार्फत राजाचे अपील विलायतेला रवाना झाले.
डायरेक्टर बोर्डाचा प्रतापसिंहाविषयी फार अनुकूल अभिप्राय असल्यामुळे, त्यानी जहागीरदारांवरील त्याचे मांडलिकत्व निस्संदिग्ध ठरवून, तसा जबाब मुंबईल पाठवला. पण जबाब इकडे आला नि क्लेअर गवर्नर बदलून त्याच्या जागी सर रॉबर्ट ग्रांट झाला. (मार्च १८३५) अर्थात बोर्डाचा जबाब तसाच पडून राहिला. मुंबईच्या कचेरीत फायल्यांच्या ढिगाराखाली. आपल्या अभिप्रायाला धुडकावणारा जबाब सेक्रेटरी नि सल्लागार कशाला उजेडात आणतील? तशाच त्यांचे कान चावणारा नातू पुण्याहून मुंबईला सारखा खेटे घालीतच होता.
क्लेअरच्या अमदानीत नातूने मुंबई सरकारच्या खास कारभान्यांवर आपले वजन चांगलेच प्रस्थापित करून ठेवले होते. नातू म्हणेल तसे बिनबोभाट होत असे. हा गवगवा चोहीकडे फैलावतच राज्यक्रांतीच्या काळांत ज्यांची नुकसानी झालेली होती, असे लोक नातूच्या वाड्यात गर्दी करू लागले. तो मागेल तितका पैसा त्याला देऊन, आमचे एवढे काम करून द्या, असे सांगू लागले. नातूचे ग्रह या वेळी कमाल उच्चीचे असल्यामुळे मागल्या पुढल्या दरवाजानी लक्ष्मी त्याच्या घरात घिसाडघाईने घुसू लागली. मुंबईचे सेक्रेटरी नि सल्लागार, बोर्डाच्या निर्णयामुळे प्रतापसिंहावर दातओठ खाऊ लागले.
नातूकटाचा श्रीगणेशा
राजाविरुद्ध गवर्नराच्या कचेरीला बगलेत मारूनच नातू थांबला नाही. आंग्रेजी विरुद्ध फितूर केल्याच्या आरोपाखाली प्रतापसिंहाला चेचण्याचा त्याने मोठा गुप्तकट तयार केला. या कटांत हजारो ब्राम्हणपुत्र पैसे चारून त्याने कामाला लावले. याची पहिली चुणूक म्हणून हरि त्रिंबकपंत नावाच्या एका इसमाचे प्रतापसिंहाच्या नावाने मुंबईन आलेले पत्र मासलेवाईक आहे. प्रतापसिंहाने त्यातला इसील ता. १३-१०-१८३४ च्या डायरीत लिहिला तो असा.-
"अदालतीचे साहेबाबरोबर कोल्हापुरास आमची रवानगी जाली. तेथून परत आल्यावर गवरनर दापोडीस आले. सबब तसेच पुढे गेलो तो आज्ञा जाली की इंदूर देसी जाये. ते समयी बहुत येत्न केला की राजश्री बालासाहेब भोसले द गोविंदराव दिवाण किंवा रवलोजी लिंगोजी कासकर यातून कोणाची तरी येकांती भेट होईल. त्याजपासी नवल विषेश समजाऊ. त्याद्वारे माहाराजास निवेदन होईल. परंतु भेटीचा योग जाला नाही. आणि आदालतीची मंडळी निकडीने बानकोटास गेली तेथे फुरसत पाहून हे पत्र लिहिले आहे. त्यास हलीचे कायदे विदितच असतील. हे पत्र येकांती आपण उमेयता व बाळासाहेब पाहून मनास आल्यास येत्न त्वरेने करावा तरी पुढे बहुत उपयोगी पडेल, त्यांस मुंबईत बाकतर इसमिटण सो आहेत, त्याचा अत्यंत स्नेह करून घेणे, पत्री लिहितो त्याप्रमाणे साध्य करून घेणे, तो मजकूर रघुनाथ राम जोशी वैद्य हे साहेबाचे कारभारी लोभातील आहेत. याचे हातून परिस्फुट न होता कार्य होईल. त्यास सरकारानी येक पत्र साहेबास पाठवावे की तुमचे कारभारी याचे कारण आहे. त्यास सातार्यास पाठवावे. यात वर्कड आदालतीचे साहेबाचे वगैरे इष्टत्व आनायास होईल. वैद्य यास कोलापुरकर छत्रपति नेणार त्याचे पूर्वी मुदाम कारकून पाठवावा, हा उद्योग कोणासच कळू नये. आपले बुधीनेच लियां (लिहिले) म्हणून पत्र लिहावे. योगी सरकारचे नावे पत्र व सेनापतीचे नावे लियो (लिहावे) त्यात की बुवासाहेब (प्रतापसिंहाला बुवासाहेब असे म्हणत असत.) माहाराज याचे पत्र तुमचे लाखोट्यात भिडले ते येकांती महाराजास उभय बंधूस समजाऊन त्वरेने करून घ्यावे व गोविंदराव दिवाण यास नमस्कार सांगावा."
कोण कुठला हरि त्रिंबकपंत आणि तो महाराजांना हे गुप्त पत्र पाठवतो! राजकारणाचा गुप्त, अगदी जिव्हाळ्याचा सल्ला देतो! अशा पत्रांचा हेतू काय, हे खुलाशाने सांगायला नकोच. प्रतापसिंहाने तेपत्र बाळासाहेब सेनापतीच्या हस्ते रसिदंट लाडवीककडे पाठवून दिले. आता प्रतापसिंहाला समजून आले की आपल्याला खाड्यात घालण्याच्या कारवाया कोठेतरी शिजत आहेत.
इंग्रेज तितुका साम्राज्यवादी
सर रॉबर्ट ग्रीट या घुम्या खट्याळ नि दुष्ट गवर्नराच्या नावानेच मुंबईचे ग्रांट मेडिकल कॉलेज स्थापन झालेले आहे. याचा जन्म हिंदुस्थानातच सन १७७९ साली झाला. १८३५ च्या मार्चात तो मुंबईचा गवर्नर झाला. ९ जुलई १८३८ रोजी पुण्यानजीक दापोडीला मेला. त्याचे प्रेत पुण्याच्या सेण्ट मेरी चर्चाच्या आवारात पुरले. सर ग्रांट मोठे पापभीरू, सात्विक, देवधर्मनिष्ठ, अशी ख्याती होती. याने रचलेली अनेक कवने इंग्लंडच्या चर्चातून मोठ्ये भावीकपणे गाईली जात असत. असल्या या सोवळ्या नि कर्मठ गवर्नराने, तितक्याच देवभोळ्या नि सात्विक प्रतापसिंहाचा अमानुष छळ करून त्याला माणसांतून कसे उठवले हे आपल्याला आता पहायचे आहे. साम्राज्यवर्धनाचा प्रश्न आला का अंग्रेजलोक देव, धर्म, न्याय, नीति, फार काय पण माणुसकीसुद्धा चर्चच्या तक्तपोशीला कशी टांगून ठेवतात, हे या सर ग्रांटाच्या उदाहरणाने पटण्यासारखे आहे.
नातूने गवर्नरला डागाळले
सर रॉबर्ट ग्रांट मुंबईला येताच, कौन्सिलरांच्या वशिल्याने नातूने त्याची खास भेट घेऊन, प्रतापसिंहाविषयी सगळ्या भानगडींचा पाढा वाचला आणि त्याच्या मनात राजाविषयी तिटकारा पेरला. जत, भोरचे सचीव आणि अक्कलकोट या जहागिर्यात राजाने नजराणे वसूल करण्यात फार जुलूम जबरदस्ती चालविल्यामुळे, ते बिचारे जहागीरदार खंगणीला लागले आहेत. त्याना आंग्रेज बहादुरांशिवाय कोणाचा आता आधार, वगैरे सांगून नातूने सर ग्रँटला कट्टा छत्रपतिद्वेष्टा बनवून ठेवले.
दोनच महिन्यांनी रिवाजाप्रमाणे सर ग्रांट गवर्नर महाबळेश्वराला हवा पालटायला मे [१८३५) महिन्यात आले. शिरस्त्याप्रमाणे प्रतापसिंह रसिदंटासह लवाजम्यानिशी गवर्नराच्या भेटीला गेला. साधू महात्म्याच्या आविर्भावाने सर ग्रांटने महाराजांची मुलाखात घेतली. जहागीरदारांसंबंधी तहनाम्याचे कलम नि आजवरचा रिवाज याचे महाराजांनी स्पष्टीकरण केले आणि डायरेक्टर बोर्डाचा निर्णय मागविला आहे तो लवकर आणविण्याची लाटसाहेबानी तजवीज करावी अशी विनंती केली. सर ग्रँटाने मोठ्या सहानुभूतीचा आव आणून, धोडला स्मरणपत्र पाठविण्याची लाडवीकला सूचना केली.
लाडविकने तेथल्या तेथेच खलिता तयार करून गवर्नरच्या हातात दिला. त्या बेट्याला नि प्रतापसिंहाला काय माहित की बोर्डाचा महाराजाला आलेला अनुकूल निर्णयाचा खलिता संभाषणाच्या वेळी सर ग्रांटच्या खिशातच होता तें! शिरस्त्याप्रमाणे सातार्याला भेट द्यावी अशी गवर्नरला विनंती करून प्रतापसिंह परतला. सर ग्रांटाने येतो म्हणून आश्वासन दिले, पण तसे काहीहि न करता तो तड़क महाबळेश्वराहून मुंबईला परत गेला. राजधानीला परत भेट न देणारा हा पहिलाच गवर्नर. प्रतापसिंहाला फार वाईट वाटले. त्याची सारी तयारी नि खर्च पाण्यात गेला.
डायरेक्टर बोर्डाची प्रतापसिंहाला देणगी
पापग्रह नातूने मुंबईचे सेक्रेटारिअट जरी छत्रपतिद्वेषाने भारून ठेवले होते, तरी लंडनच्या डायरेक्टर बोर्डाला प्रतापसिंहाविषयी मोठा अभिमान नि कौतुक वाटत होते. त्यानी तीन हजार रुपये किंमतीची एक रत्नजडीत तरवार आणि सोबत गौरवाचे एक पत्र, मुंबई सरकारच्या मार्फत प्रतापसिंहाला ता. २९ डिसेम्बर १८३५ रोजी पाठविले. नातूच्या चिथावणीने प्रतापसिंहाला उखडण्याचे पद्धतशीर बात मुंबईला शिजत असतानाच, डायरेक्टर बोर्डाचे हे पत्र आणि ती तलवार आलेली पाहून, सर ग्रांटचा सात्विक आत्मा तळमळला, त्याने ते पत्र नि तलवार तशीच दाबून ठेवण्याचा हुकूम दिला.
प्रतापसिंहाने पेचात धरले
१८३६ चा मे महिना उजाडला. एक वर्ष होऊन गेले तरी आपल्या अपिलाचा बोर्डाकडून निकाल येई ना, याचे प्रतापसिंहाला आश्चर्य वाटू लागले. नेहमीप्रमाणे सर ग्रांट महाबळेश्वराला आला. महाराजानी भेट घेऊन स्पष्ट विचारले की आज दोन-तीन वर्षे जहागीरदारांचे प्रकरण कुझत पडले आहे. गुदरत साली आपणहि बोर्डाला स्मरणपत्र पाठविले, तरीहि काही जबाब नाही. मुंबई सरकारचे यात काही वळत नसल्यास, मला कलकत्त्याच्या बडेलाटाकडे किंवा थेट लंडनला वकील पाठवून शहानिशा करून घेतली पाहिजे. प्रतापसिंह निकरावर आलेला पाहून सर ग्रांटची पाचावर धारण बसली. कलकत्ता लंडन याने काही लिहिले अथवा वकील पाठविले, तर त्यात मुंबईकरांचा खोडसाळपणा तेव्हाच सिद्ध होणार आणि आपल्यावरहि वरिष्ठांचा ठपका येणार. कदाचित गवर्नरीहि जाणार. सर ग्रांटने सारवासारवीची उत्तरे देऊन प्रतापसिंहाला तात्पुरता बनवण्याचा यत्न केला. या वेळीहि साताराला भेट देतो असे वचन देऊनहि सर ग्रांट परस्पर मुंबईला निघून गेला.
आता मात्र प्रतापसिंह आपल्या परिस्थितीचा कस्सून विचार करू लागला. पण त्याला काय माहीत की हा विचार होईपर्यन्त नातूकंपूच्या राजकारणी गुप्तकटाच्या वाळवी खुद्द त्याचा राजवाडा पोखरीत होत्या! तशात. ता. ४ सप्टेंबर १८२५ रोजी मुंबई सरकारने हुकूम काढून, पुण्याचा दफ्तरखाना तेथल्या प्रतिष्ठित नागरिकांच्या कौन्सिलखाली देऊन, बाळाजीपंत नातूला प्रधान अमानतदार या हुद्याने त्या कौन्सिलचा अधिपति बनविले होते. अर्थात दक्षिणेतल्या अनेक सरदार दरकदारांचा तो मोठा वशिलेश्वरच झाला. मुंबई ते पुणे, पुणे ते सातारा, हवा तेथे हवेसारखा नातू थाटामाटात दौरे काढू लागला. असली मोकळीक मिळाल्यावर त्याने महाराजाविरुद्ध महाराष्ट्रव्यापी कारस्थानाचा उपद्याप केला नसता तर तो नातू कसचा!
यदाकदाचित प्रतापसिंहाने कलकत्ता किंवा लंडन, अथवा दोनीहि ठिकाणी पत्रे अगर वकील पाठविले, तर मुंबई सरकार नि गवर्नर यांना दोनीहि वरिष्ठांकडून दोष देण्यात येईल. याची गवर्नरच्या बंगल्यावर चर्चा चालली असताना, नातूने तहनाम्याच्या पांचव्या कलमावर बोट ठेऊन, स्पष्ट खुलासा केला की ‘राजाने अशी काही हालचाल केली पुरे, का त्याचे राजेपण कंपनी सरकारला एका क्षणात काढून टाकता येईल’. जहागिरदारांविषयी ७ व्या कलमाचा जर आपल्याला हवा तसा अर्थ ठरवता आला, तर ५ वे कलम म्हणजे राजाच्या डोईवर केसाने टांगलेली तरवार आहे. केस तोडला की झाले काम. गवर्नरादि गोर्या महादेवानी नातूच्या बुद्धिमतेची टाळ्या वाजवून वहावा केली.
सातारा पुण्याची ब्राम्हण-संघटना
प्रतापसिंहावर राजकीय फितुरीचा आरोप लादण्यासाठी आणि नाना तर्हेच्या कुभांडाच्या अफवा फैलावण्यासाठी, नातूने आपल्या हस्तकांमार्फत महाराष्ट्रातली बहुतेक ब्राम्हणांची घरे आणि पोरें कामाला लावली. तरुण पाठशाळा पोरांपासून तो भिक्षुकीवर संसारगाडे रेटणार्याभिकंभट धोंडभटापर्यन्त यच्चावत ब्राम्हण नातूच्या या ब्राम्हण संघटनेत सामील झाले. अमक्या तमक्या कारस्थानाची बित्तंबातमी मला आहे, साहेब अमूक हजार रुपये देतील तर मी त्या कारस्थानाचे अस्सल दस्तऐवज मिळवून देतो. अशा थापा लष्करातल्या गोर्या हापसराना मारून पैसे उकळण्याचा ब्राम्हण तरुणांनी एक राजरोस धंदाच चालविला होता. जेथे कंपनीच्या सैन्याचा तळ पडत असे (आणि सातार्याला तर रेसिडेन्सीच होती) तेथे काही ब्राम्हण तरूण इंग्रजी बोलायला शिकण्याच्या निमित्ताने जा-ये करीत असत. तेथल्या गोर्या हापसरांचा साधारण परिचय होताच आणि ओळख नसतांहि कोणाशीहि घसट पाडण्याच्या कलेत भट जात्याच मोठा चिकट. ते त्यांना राजधानीतल्या नि राजवाड्यातल्या खर्या खोट्या गोष्टी तिखट मीठ लावून सांगत असत.
कंपनीच्या सैन्यात आणि कचेर्यात हि अचाट बुद्धि चालवून बळेच लक्ष्मी मिळवण्याचा उपद्याप करणारे ऊर्ध्व महत्त्वाकांक्षी टॉमीलोक पुष्कळ असत. जात्याच ते चौकस, शिवाय त्यांना मराठी भाषा समजण्याची पंचाईत पडायची. म्हणून इंग्रजीच्या मोबदल्यात ते या जवान भटांकडून मराठी शिकत असत. हिंदु राजाच्या घरातला एकादा नाजूक भेद या बामणांच्या पोरांकडून समजला नि तो आपण वरिष्ठाना कळवला तर बढ़ती नि बक्षिस मिळण्याची मोठी आशा. इंग्रजी मराठी भाषेची ही संभावीत देवघेव म्हणजे छत्रपतिविरुद्ध वाटेल त्या कागाळ्या नि कुमांडे आंग्रेजी छावण्यात फैलावण्याचे तारायंत्रच बनले. प्रधान अमानतदार नातूच या तारायंत्राचा पुरस्कर्ता असल्यामुळे, आडज्युटंट कैंपटन्सचे काय, पण स्वतः रेसिदंटसुद्धा या थापाड्या भटपुत्राच्या कच्छपी लागले.
गवर्नरकडे नातूच्या कागाळ्या
कौन्सिलर आणि नातू आता एकजीव नि एकजिव्ह झाल्यामुळे, ते गवर्नरकडे प्रतापसिंहाविरुद्ध वाटेल त्या नालस्तीच्या बातम्या सांगू लागले. "प्रतापसिंहाला वेड लागले आहे. हिंदुस्थानचे मालक नि अधिपति कुंफणी सरकार बहादूर असता, हा वेडा राजा स्वताला छत्रपति, हिंदुपदपातशहा, क्षत्रियकुलावंतस म्हणवितो. वेडाच्या भरात आपल्या नि इतर नातेवाईक मराठ्यांच्या तरण्याताठ्या पोरीना बेधडक लोकांसमक्ष घोड्यांवर बसायला लावतो. नेम मारणे, तोफा डागणे, भाला फेकणे असली मर्दानी कामे त्या पोरीना शिकवतो. मरगड्यांच्या पोराना आजवर कधि कोणी संस्कृत शिकताना पाहिले आहे? आता ती कारटी खुशाल वेदवाक्यांचा घोष करतात! त्या परभुटल्याना तर काय तो वेडापीर डोक्यावर घेऊन नाचतो आहे." इत्यादि नि वगैरे हजार नालिस्या नातू गवर्नरासमोर रोजच्या रोज करीत असे. इतकेहि करून तो थांबला नाही, तर खुद्द मुंबईचे लाट नातूच्या पक्षाला सामील झाले असून, महाराजावर गवर्नराची इतराजी झालेली आहे, अशा गप्पा पुणे ते बेळगांवच्या वातावरणात त्याने फैलावल्या. अर्थात लोकांवरहि या गप्पांचे विपरीत परिणाम झाले. प्रतापसिंहाला उखडण्यासाठी, ब्राम्हण संघटना करूनच नातू स्वस्थ बसला नाही, तर त्याने राजाचा पाठचा भाऊ दुर्व्यसनी आप्पासाहेब यालाहि आपल्या कटात सामील करून घेतला. खुद्द राजाचा भाऊ राजाच्या विरुद्ध हातबोटे चोळू लागला. त्याच्यावर नाही नाही ते घाणेरडे आरोप करू लागला.
नूसपेपरात गैरवाका मजकूर
त्या वेळी वर्तमानपत्रे नुकतीच कोठे निघू लागली होती. लोकांनाहि त्यांचा मोठा बागुलबोवा वाटायचा. या तंत्राचाहि नातूकंपूने उपयोग करून घ्यायला सोडले नाही. बाबाजी सुभेदार नावाच्या एका इसमाने प्रतापसिंहाच्या विरुद्ध एका वर्तमानपत्रात खोडसाळ माहिती छापली. त्याचा अर्थात महाराष्ट्रभर मोठा गवगवा झाला. रसिदट लाडविकने महाराजांची भेट घेऊन "मनात काही वाकडे आणू नये, कारण नूसपेपरवाल्याची चाल की कोणी काही छापविले तरी ते छ्यापीत असतात. त्याप्रमाणे खरे मानू होते आसे नाही." असे सांगितले, त्यावर महाराज म्हणाले. “त्याचे शुभ व अशुभ या दोहीचेहि मनात आणणे गरज नाही. आपली चाल नीट असून दुसर्याने वाईट म्हणाल्यास ते मनास आणावयाची गरज काय? इकडे काहीएक मनात नाही."
पापग्रह नातू--सचिवाची युति
छत्रपतीला खाड्यात घालण्याच्या कारस्थानांत, नातू सांगलीकराच्या जोडीने नि तंत्राने, मोरच्या पंतसचिवानेहि आपल्या दुष्टाव्याची कमाल केली. प्रतापसिंहाविरुद्ध मुंबईच्या गवर्नरला भडकवण्याच्या कामी चित्पावन नातूने हे सचिवाचे देशस्थ पात्र फार चातुर्याने हालवले. जहागिरदार हे छत्रपतीचे मांडलीक, हा मुद्दा अनेक वेळा हडसून खडसून ठरला गेला, तरी तो सपशेल अमान्य करण्याच्या चिथावण्या नातूने पंताला दिल्या नि त्याच्या बाजूने मुंबई सरकारला उठवले. चिमणाजी मेल्यावर त्याचा दत्तक रघुनाथ याचे नि त्याच्या दशक आईचे वाकडे आले. ती भानगड प्रतापसिंहाने मिटवली तरीहि एका बाजूने भवानीबाईला चिथावण्याची आणि दुसरीकडून रघुनाथपंताला नाना प्रकारच्या भानगडीत खेचून कर्जबाजारी करण्याची नातूने शिकस्त केली. जहागीर कर्जबाजारी झाली तर तिचा कारभार आपल्या हाती घेण्याचा अधिकार छत्रपतीचा होता.
रामराव डफळ्याच्या जतेचा कारभार असाच प्रतापसिंहाने हातीं घेऊन थोड्याच वर्षात ती जहागीर कर्जमुक्त करून दाखविली होती. याबद्दल ता. ३१-१२-१८३१ च्या पत्रात कर्नल रॉबर्टसनने मुंबईला लिहिले होते की ‘जो डफळे पूर्वी महाराजाच्या नावाने हातबोटे चोळीत होता. तोच आता महाराजाचा मोठ्यातला मोठा स्तुतिपाठक बनला आहे!’ अक्कलकोटचाहि असाच बंदोबस्त केला होता. निंबाळकर जहागीरहि महाराजानी सुधारली होती. पण भोरच्या सचिवाला नातूशनि चिटकल्यामुळे, प्रतापसिंहाने तिकडे फारसे लक्ष दिले नाही. वास्तविक नजराण्याबाबत नि दत्तकाच्या परवान्याबाबत प्रतापसिंहाने सचिवाला ऐसपैस सवलती दिल्या, हे मुंबई सरकारलाहि माहीत होते आणि त्याबद्दल त्यांनी महाराजाना धन्यवादहि दिले होते. पण रघुनाथपंताचा कृतघ्नपणा और होता! तो मुळी छत्रपतीच्या स्वामित्वालाच कबूल नव्हता.
नातूच्या नादाने पंत कर्जाच्या खड्यात आकंठ बुडाला. तशात त्याच्या हद्दीत उमाजी नायकाचे बंड चालू झाले. अनेक दरोडेखोर टोळ्या रत्नागिरी पुणे वगैरे आसपासच्या मुलखात दरोडे घालीत आणि सचिवाच्या हद्दीत पळून जात. पुण्याच्या सुभ्याने किंवा रत्नागिरीच्या कलेक्टराने आरोपींची मागणी केली तर सचिव दाद घेत नसे. याचा बंदोबस्त करावा म्हणून कंपनी सरकारचा सुभा रॉबिन्सन याने रसिदंटामार्फत महाराजाकडे अनेक वेळा लिहिले आणि महाराजानीहि सचिवाला कडक हुकूम पाठविले. या पत्रापत्रीला लागायचा वेळ आणि बंडाचा धिंगाणा तर सारखा जोराने चालू.तेव्हा सचिवाशी परस्पर बोलणीचालणी करण्याची परवानगी रॉबिन्सनने मागितली आणि प्रतापसिंहाने कार्याचे महत्व जाणून ती दिली. परस्पर पत्रव्यवहाराच्या या खास सवलतीच्या परवानगीवर मुंबई सरकारने, "सचीवावर हुकमत कंपनी सरकारची, छत्रपतीची नाही.” असा अर्थ बसवून चांगलाच अनर्थ केला. आंग्रेजांची ‘इण्टरप्रिटेशन’ अशी धोकेबाज असतात.
पंतसचिवाला अडीच तीन लाखांचे कर्ज झाले होते. रसिदंटाच्या इषार्याना धाब्यावर बसवून नातूने पंताला कर्ज मिळवून दिले आणि त्याच्या मोबदला निरा नदीच्या उत्तरेकडचा त्याचा मुलूख स्वतःच्या वहिवाटीला लाऊन घेतला. इकडे मुंबई सरकारला हा मुलूख केव्हाही सरकारच्या हद्दीला जोडता येईल. अशी थाप मारली आणि तिकडे पंताला चिथाऊन सरदारांच्या एजंट कचेरीकडे अर्ज करायला लावले की ‘मी तर कर्जबाजारी नि छत्रपति नजराण्यासाठी तगादा करतात, त्यांची नजराण्याची अट कायमची उडवून द्यावी.’ परइलाख्यात कर्ज काढू नये, असा २ मार्च १८३४ चा महाराजांचा सचिवाला खलिता गेला, तेव्हा त्या कृतघ्न गटाने जबाब दिला की ‘आम्ही कोणत्या इलाख्यातले हे समजले पाहिजे.’ या उत्तराने रसिदंट नि महाराज दोघेहि संतापले. प्रकरण विकोपाला जाऊ नये म्हणून नातू येथेहि आडवा पडला आणि ‘पंताने गैरसमजुतीने तसे लिहिले, महाराजानी क्षमा करावी नि ते पत्र माझ्या हवाली करावे,’ अशी याचना केली. मागू तेव्हा बिनशर्त हजर केले पाहिजे, अशा अटीवर महाराजानी ते पत्र नातूला दिले. सारांश, नातूच्या कारस्थानांच्या अनेकमुखी उभारणीला आणि अखेर छत्रपतीचा नि रंगो बापूजीचाहि घात करायला भोरचा पंतसचीव प्रामुख्याने कारण झाला. (विशेष दस्तऐवजी तपशीलासाठी परिशिष्ठांतल्या नोंदी पहा.)
प्रकरण १५ वे
नातूच्या ब्राम्हण - संघटनेचे स्वरूप
"या भटाना एकादा भटी कावा साधायचा असला म्हणजे ते काय काय अत्याचार नि भानगडी करतील याचा नेमच नाही. त्यांचे बेत साधण्यासाठी करू नये त्या गोष्टीसुद्धा करायला ते मागे पुढे पहात नाहीत. कारण त्याना पक्के माहीत असते की हेतू साध्य झाला म्हणजे साधनांच्या बरेवाईटपणाची चौकशी कोण कशाला मरायला करतो?” मेजर जनरल रॉबर्टसन (लंडनचे व्याख्यान.)
गवर्नर सर ग्रांटच्या एकाच वर्षाच्या अमदानीत. खुद्द त्याच्याच उत्तेजनाने, प्रतापसिंहाला ठेचून काढण्याचे कारस्थान नातूने हिरीरीने हातात घेतले. १८३६ च्या मे महिन्यात महाबळेश्वरला कलकत्ता नि लंडन येथे वकील पाठविण्याची राजाने गवर्नरला दिलेल्या इषारेवजा धमकीने तर खुद्द गवर्नर नि त्याचे सल्लागार मंडळ चांगलेच पेचात पडले होते. तेव्हा काय वाटेल ते कारस्थान करून या मानी राजाला चहूबाजूनी सापळ्यात धरून कायमचा चेचावा, या बातबेताची चक्रे जोराने फिरू लागली. कर्नल लाडविकलाहि सरकारी धोरणानुसारच वागण्याचा कानमंत्र गवर्नरकडून मिळाला होता. एरदी लावधिक सीधा नि सरळ मनाचा आदमी होता. पण पूर्वीच्या तीन रसिदंटासारखा त्याच्या अकलेचा पाठकणा टणक नि दमदार नव्हता. ग्रांटडफ, ब्रिग्ज नि रॉबर्टसन वाजवी दिसेल ते बोलणारे, करणारे आणि मुंबई सरकारला दणकावून सांगणारे खंबीर होते. लाडविक वरिष्ठाना भिऊन वागला. त्याला अनेक कुकर्मे नाइलाज म्हणून करावी लागली आणि अखेर विलायतला गेल्यावर, त्याने मुंबई सरकारच्या दडपणाचा सगळा पाढा बोर्ड ऑफ डायरेक्टरांपुढे वाचून, स्वताच्या पापांचे प्रायश्चित्त घेतले.
कुठे आहे तो रंगो बापूजी? बोलवा त्याला
आंग्रेजांच्या प्रसादाने पेशव्यांच्या कैदखान्यातून मुक्ता झाली. राजगादी मिळाली. कारभार चालू झाला. या १७-१८ वर्षांच्या अवधीत या सगळ्या क्रांतीला उपयोगी पडलेल्या रंगो बापूजीची प्रतापसिंहाला एकदाहि आठवण झाली नाही. कंपनी सरकारची मामलतदारी सोडून सन १८३१ व त्याने आपल्या दीनावस्थेचा अर्ज केला, तरीहि त्याची दखल घेण्याची त्याला बुद्धी झाली नाही. देशी राजांचा असला मतलबी विसरभोळेपणा अजूनहि कायम आहे. त्यांच्या तोंडासमोर ज्या वेळी जो नाचेल, तो त्यांना प्यारा. आपल्या अडचणीच्या किंवा संकटाच्या वेळी कोणी केव्हा किती खस्ता खाल्ल्या, याची त्यांना आठवणच रहात नाही. जेव्हा आता पुन्हा तुफानाचे उलटे वादळी वारे जोराने वाहू लागले, तेव्हा प्रतापसिंहाने रंगो बापूजीला आठवणीने परत बोलावून लंडनला वकील पाठविण्याच्या कामाची व्यवस्था पाहण्यासाठी एजंट-मुखत्यार म्हणून मुंबईला ठेवले.
मुंबईच्या मेडिकल बोर्डाचा प्रेसिडेण्ट डॉक्टर मिलन, ग्रांटडफ अलपिष्टनानीच प्रतापसिंहाच्या परिचयाचा करून ठेवला होता. सातारला होत असलेल्या सर्व घटनांचे कागदपत्र डॉ. मिलन यास दाखवून रंगो बापूजीने कलकत्ता आणि लंडन येथे जहागिरदारांचा प्रश्न धसाला लावण्याची त्याच्यामार्फत व्यवस्था चालविली. इतकेच नव्हे तर सयद मीर अफलजआली नावाच्या एका मुसलमान गृहस्थाला लंडनला वकील म्हणून पाठविण्यासाठीहि त्याने तयार करून ठेवला. मात्र मुंबई सरकार त्याला सुखासुखी मुंबई बंदरातून लंडनला जाऊ देणार नाहीत, म्हणून मक्केच्या निमित्ताने त्याने मुंबईच्या बाहेर पडावे, अशीहि गुप्त योजना रंगोबाने केली.
लाडविकची मुंबईला पहिली तक्रार
नातूच्या हरएक हालचालीमागे गवर्नरचा हात आहे. अशी लाडविकची खात्री पटल्यामुळे नातू सांगेल ते त्याला आता प्रमाण मानल्याशिवाय सुटकाच नव्हती. महाराज विलायतेत वकील पाठविणार ही कुणकुण नातूमार्फत त्याला समजताच, मुंबईला एकदम तक्रार करण्यापूर्वी या भेदरट परंतु सभ्य रसिदंटाने ता. १६ जून १८३६ गुरुवारी सकाळी महाराजांची भेट घेतली.
लाडविक- डाक्टर मिलन किंवा दुसरे साहेब यांना महाराजानी भेटीला नि मदतीला बोलाविले आहे, ही गोष्ट खरी काय?
प्रताप- खरी आहे. डाक्टर मिलन अलपिष्टन ग्रांटच्या वेळेपासून आमचे दोस्त. मुंबईप्रमाणेच कलकत्ता नि लंडनच्या बोर्डापर्यन्त त्याना मान आहे. ते नेहमी इकडे येतात जातात. जहागीरदारांचा प्रश्न त्यांच्यामार्फत बडेलाटाना कळविण्यासाठी त्याना इकडे बोलावले आहे.
लाडविक- सयद मीर अफलजअल्ली हा कोण आहे! त्याला तुम्ही विलायतेला पाठविणार असे ऐकतो.
प्रताप- तो आमच्या रंगोबाचा मुंबईचा स्नेही आहे. तो मक्केला जाणार आहे.
लाडविक- रसिदंटाशिवाय बाहेर व्यवहार चालू झाले तर तहनाम्याच्या शर्तीचे ५ वेकलम आपण तोडल्यासारखे होणार आहे.
प्रताप- ते कसे काय? ते कलम स्पष्ट परराज्याविषयी आहे. इंग्रेज सरकार काही आम्हाला परकी नाही. आम्ही त्यांचे दोस्त आहोत. दोस्तांच्या बडेलाटाकडे वकिलात करायला किंवा थेट लंडनच्या बोर्डाकडे दावा मांडायला हरकत कसली? आमच्या मांडलीक जहागीरदाराना थेट गवर्नरकडे प्रत्यक्ष अर्ज तक्रारी करण्याची मोकळीक आणि आम्ही कलकत्त्याला किंवा लंडनला वकील पाठविणार म्हणताच तहनाम्याचा भंग होतो! हा पांचव्या कलमावर बसविलेला नवा अर्थ मात्र अजब खरा! तुम्ही आमचे अर्ज दाबून ठेवावे, पुढे गेलेच तर मुंबईकरानी ते अटकाव करून ठेवावे आणि आम्ही कलकत्त्याला नि लंडनला वकील पाठवू म्हटले तर त्यालाहि मज्जाव! हा कोंडमारा मोठा मासलेवाईक आहे. इतक्या वर्षात एकाहि गवर्नराने किंवा रसिदंटाने अशी भाषा काढली नव्हती.
महाराजांचे म्हणणे लाडविकला खोडून काढताच येईना. त्याने ता. २० जून १८३६ सोमवारी, या मुलाखतीचा संदर्भ देऊन, ‘सयद मीर अफलजअली नावाच्या एका मुसलमान गृहस्थाला महाराज लंडनला पाठविणार आहेत. हा तहनाम्याचा भंग होतो किंवा कसे, हे नामदार साहेबानी ठरवावे,’ असा खलिता मुंबईला रवाना केला.
बनावट दस्तऐवजांची ब्राम्हणी गिरणी
ग्रामण्यांच्या हंगामात प्रभू मराठे सोनारादिकाना शूद्रातिशूद ठरविण्यासाठी चिंतामणराव सांगलीकराने बनावट याद्या, आज्ञापत्रे, पोथ्या तयार करण्याचा सांगलीला कारखाना काढला होता. तेथेच वाकबगार झालेले अनेक जवानमर्द ब्राम्हण तरुण, प्रतापसिंहाच्या सही शिक्क्याचे बनावट फितुरी दस्तऐवज तयार करण्याच्या कामावर नातूकंपूने लावले. स्वताच्या हरएक कर्माना सार्वजनिकत्वाचा ऊर्फ राष्ट्रीयपणाचा मुलामा देण्याचा चित्पावनांचा शिरस्ता नातूपासून आतापर्यंत अविच्छिन्न चालत आलेला आहे. म्हणून या बनावट पत्रांच्या कटांत चारदोन बामणेतर पात्रे लटकावायची कारवायी चाणाक्षपणाने करण्यात आली. रेसिडेन्सी कचेरीतला नातूचा मुख्य हस्तक बाळाजी काशी किये आणि त्याचा उनाड पुतण्या गणपतराव यानी भास्कर विश्वनाथ ऊर्फ भाऊ लेले नावाच्या एका वाईकर खटपट्याला हाताशी धरला. हा भाऊ लेल्या महा पाताळयंत्री नि उलट्या काळजाचा होता.
प्रतापसिंहाचा रेसिडेन्सीशी पुष्कळ पत्रव्यवहार झालेला असल्यामुळे, त्याच्या स्वदस्तुरच्या मखलाशांचे शेकडो नमुने किबे कंपूच्या हातात होते. पण पत्रांवर मारले जाणारे शिक्के मात्र खास राजवाड्याच्या जामदारखान्यात पक्क्या पहार्याखाली तिजोरीत ठेवलेले असत. जामदारखान्यात रंगो महिपत लिहिण्याचे कामावर असे. तो आजारी असल्यामुळे त्याचा मुलगा विश्वनाथ लिहिण्याचे काम करी. भाऊ लेल्याने विश्वनाथाच्या मार्फतीने तेथला पहारेकरी जानू भंडारी, हैबतराव सिकारखाने, कारकून आपा सिंदकर, बापूजी आनंदराय, सीताराम गोपाल खरसीकर वगैरे राजाची नोकरमंडळी कुशलतेने वागवून आपल्या कटात घेतली. मुंबई सरकार महाराजावर बिथरले आहे. प्रत्यक्ष पाठचा भाऊ आप्पासाहेब नातूला मिळाला. तेव्हा सद्दीचा जोर अर्थात आप्पासाहेबाकडे अशा खात्रीने आणि हजारो लाखो रुपयांच्या कंपनीकडून मिळणार्या इनामांची लालूच लेल्याने दाखविल्यामुळे, प्रतापसिंहाच्या नोकरांच्याहि मनाची चलबिचल उडाली. भाऊ लेल्याने त्याना किष्यांच्या मार्फत थेट नातू आणि लाडविकच्या मेटी करवून, ‘आम्ही महाराजांचे राज्य युक्तीने घेतो. तुम्ही येश द्यावे, दाहा हजार रुपयांचे इनामगाव व येक लाख रुपये बक्षीस देऊ,’ अशी आश्वासने देवविली आणि बनावट फितुराची महाराजांच्या नावाची शेकडो पत्रे लिहून स्थावर अस्सल शिक्के दोवून, मखलाशांसाठी किव्याकडे पाठविण्याची, खुद्द महाराजांच्या राजवाड्यातच, जामदारखान्यातच गिरणी चालू झाली. सर्व ‘देशभक्त’ नि ‘हिंदुत्वनिष्ठ’ मध्यरात्री तेथे जमायचे. पत्रे लिहायचे.
शिक्के उठवायचे, असा रोजगार चालू झाला. प्रतापसिंह आणि गोविंदराव दिवाण यांच्या हस्ताक्षरांसारखे बेमालूम अक्षर काढणारेहि ब्राम्हण कसबी या संघात सामील झाले. या कारखान्याची एक शाखा पुण्यालाहि चालू झाली. नुसते शिक्के उठविलेल्या कोर्या कागदांचे लठ्ठल रुमाल रात्रीच्या अंधारातून सगळीकडे फैलाऊ लागले. हे कटबाज लोक निरनिराळ्या फितुरी मजकुरांची पत्रे एकमेकांच्या नावाने लिहीत आणि ती मग लष्करातल्या कंपनीच्या हापसराना भारी किंमतीने विकीत असत. ते हापसर ती पत्रे रसिदंटाला किंवा थेट मुंबईला नेऊन तेथल्या अधिकार्याना विकीत असत.
सातारच्या राजाविरूद्ध मिळेल तो पुरावा पैदा करण्याचा तो हंगाम असल्यामुळे, गिऱ्हाईकाना तोटा नसे. शिवाय, पत्रांचे आणि शिक्के केलेल्या कोर्या कागदांचे रुमाल भाऊ लेले ठिकठिकाणी गहाण ठेऊन त्यावर पैसेहि काढीत असे. इतक्यात बाळकोबा तात्या केळकर नावाचे एक पात्र संघात सामील झाले. त्याने तर बनावट शिक्के तयार करून पत्रांच्या दैनिक पैदाशीचा जोर वाढविला, या कामात रेसिडेन्सीतले एकूणेक चित्पावन कारकून लेले संघाला सल्ला मसलत द्यायला, मखलाशा करायला तनमनधने मदत करीत होते. लिहिलेल्या कागदांपेक्षा, शिक्के उठवलेल्या कोर्या कागदांना तेजी भाव येत असे. कारण, त्यावर वाटेल त्याला वाटेल तो मजकूर लिहून, प्रतापसिंहाचे पत्र म्हणून हव्या त्या किंमतीने विकता येत असे. कटबाजानी एकमेकांच्या नावाने पत्रे लिहिली तरी त्यांचा अर्थ स्पष्ट असे की महाराजानी ते पत्र त्याला लिहिले. म्हणून अशा काही पत्रांचे नमूने पहा.-
(१) हस्ताक्षर हैबतराव सिकारखान्याचे. पत्र बाजीराव पेशव्याला-
"बाजीराव पंडत प्रधान पेशवे यास आज्ञा केली. तुम्ही आपले गृहकलहामुळे इंग्रेज अणिला आणि असावधपणे राज्य घालविले व स्वामित्व ध्यानास अणिले नाही. यास्तव राजाचा अभिश्राप तुम्हास आला. तो दूर करणे असल्यास, हुजूरचे पुरातन सेवक आपले पराक्रमाची शर्त करून कतल करीत आहेत. त्याची द्रव्याची वगैरे हरयेकविसी पुरवणी ठेवाल तरी अभिश्राप जाऊन तुमचे पद तुम्हाकडे करार राहील. जाणिजे छ ११ साबान.’’
(२) आपा सिंदकरांच्या हस्ताक्षरांत बापूजी आनंदला लिहिलेले पत्र-
"इंग्लेश लोकानी ह्या द्वीपावर येऊन मतलब करून सर्व राज्याचा अपहार करावा ही इच्छा धरून हस्तगत जाहले. त्यात बलाढयपणानी वागतात आणि हे द्वीप द्रव्येहीन करावे हे इच्छितात. सबब यास सिक्षा घडावी आणि राज्याचा बंदोबस्त व्हावा. याजकरिता तुम्हास मुकत्यारी दिल्ही असे. तरी याचा बंदोबस्त तुम्ही मुखत्यारीने करावयास प्राचीन दौलतदार संस्थानी गादीचे मालक व जमेदार वगैरे आहेत याची सर्वांची एकच वाट हा दुरंदेशा चित्तात आणोन सर्वत्रानी येक स्नेहभाव ठेऊन धर्मः राज्याची अभिवृद्धि होण्याकरिता साह्य करावयास सर्वाची संमते घेऊन जे कार्यास साह्य होतील. त्याचे मान व त्याचा आपला चालण्याचा तह ठरऊन देणे, हा तुम्ही जसा ठरवाल त्याप्रमाणे तुम्ही मुखत्यारीने दस्ताऐवज करून घ्यावे. ते हुजूर सरकारात मंजुर असे. तुम्हास जे अनुकूल होतील ते साह्यास घेऊन कलेल ते रीतीने धर्मराज्याची अभिवृद्धि करावी. जाणीजे छ. ११ साबान."
(३) बापूजी आनंद याने लिहिलेले पत्र-
"समस्त सावकारलोक यास की इंग्लश लोक हे समुद्राचे बेटातील रहाणार. याणी पृथ्वीवर येऊन मतलब करून सर्व राज्याचा आपहर करून हे द्वीप द्रव्यहीन करावे हे इच्छितात. सबब यास सिक्षा घडावी आणि राज्याचा बंदोबस्त व्हावा. सबब हुजूरचे लोक हे कामास योजिले आहेत. त्यास तुम्ही आनुकूल जाल्याखेरीज हे कार्य होणार नाही. याजकरिता तुमचा आमचा परंपरा स्नेह चालत आला तरी हुजूरचे लोकास तुम्ही द्रव्याचा पुरावा करून खते लिहून घेऊन लागेल ते द्रव्ये देत जावे. तुमचे पैक्याचा उलगडा व्याजसुद्धा हुजूरून केला जाईल. अथवा जाहगीर लाऊन दिल्ही जाईल. तुम्ही तिलप्राय संशय न धरणे आणि पुन्हा हुजूरचे पत्राचा अक्षेप न करणे. छ. ११ साबान."
(४) बापूजी आनंदरावचे हस्ताक्षर, पत्र आप्पा सिंदकराला-
"आत्माराम लक्षुमण देशकुलकर्णी तर्फ हिरडस मावल यास आज्ञा की तुम्ही राज्यातील पुरातन वतनदार स्वामी चाकरी येक निष्ठपणे करून राज्याचे उपयोगी पडत अला. सबब आज्ञा की हे सर्व राज्य इंग्लश याणी हरण केले. याचे शासन करणे जरूर त्यास तुम्ही फौज पुरातन सरदार व हिंदुलोक व मुसलमान वगैरे विश्वासूक ठेऊन, इंग्लश लोकाचे पारपत्ये करून, स्वामीच्या धर्मराज्याचा उपयोग करावा. जसा उपयोग तुमचे हातून घडेल तसा तुमचा बंदोबस्त करून दिल्हा जाईल जो मुलुक तुम्ही काबीज कराल त्याची वहिवाट तुम्हाकडे चालेल. तुमचेकडून घालमेल होणार नाही. जाणिले छ. ११ साबान.”
अशा मासल्याची शेकडो पत्रे बाहेर पडली. प्रतापसिंहावर आलेल्या तीन मोठ्या फितुरी राजकारणाला अनुसरून त्यांतला मजकूर असे. ती राजकारणे ही (१) प्रतापसिंहाने गोव्याच्या पोर्च्युगीज व्हाइसरायामार्फत पत्रव्यवहार करून इंग्रेजाना हुसकावण्यासाठी पोर्च्युगीज राष्ट्राची मदत मागविण्याची खटपट केली. (२) जयपूराला जाऊन बसलेल्या नागपूरच्या पदच्युत आप्पासाहेब भोसल्याशी संधान बांधले आणि (३) सातारच्या २३ व्या नेटिव पायदळ पलटणीच्या देशी अधिकाऱ्याना फितुर करण्याचा यत्न केला.
पैकी गोव्याच्या फितुरीचे काम चिंतामणराव सांगलीकर, नागो देवराव वैद्य आणि बाळकोबा केळकर यानी आपल्या आंगावर घेतले. या घाणेरडधा कामात चिंतामणराव आणि नातू यानी संकेश्वरच्या शंकराचार्यालाहि अडकवून टाकले. नागो देवरावाने शंकराचार्याला गोव्याकडे संचारार्थ नेले. बरोबर चार उमदे घोडेहि होते. ही बातमी रसिदंटाच्या कानावर घालण्याची तजवीज झाली. बिचार्या शंकराचार्याने गोव्यात कसला धर्मप्रसार केला, तो त्यालाहि समजला नसेल. पण नातूच्या चिथावणीने मुंबई सरकारने त्यावर मोठा गंभीर अर्थ बसवला.
प्रतापसिंहाने गोव्याच्या डॉन मॅन्युअल व्हाइसरॉयला चार उमदे घोडे नजर पाठविले आणि शंकराचार्यामार्फत फितुरीचे राजकारण केले. याच शंकराचार्याने कायस्थ प्रभूच्या ग्रामण्याचा कायस्थाना अनुकूल असा निकाल पुण्याला दिला होता. त्याचा चिंतामणराव नि नातू यानी असा सूड उगवण्याचा घाट घातला. शंकराचार्याच्या उरावर गुडधा देऊन कायस्थाना शूद्राधम ठरविण्यासाठी आणि प्रतापसिंहाचे गोव्याच्या गवर्नराशी फितुरीचे राजकारण सिद्ध करण्यासाठी, या दोन चित्पावन पुरुषोत्तमानी मठाच्या शिक्क्याचे हवे तेवढे कागद खरडून घेतले. या बाबत कोठे एक शब्द बोलाल तर मठासकट अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडावे लागेल, अशी आचार्याना धमकी दिली.
गोवा प्रकरणाचे फितुरी कागद म्हणजे प्रतापसिंहाने इंग्रेजाना हाकून देण्यासाठी पोर्च्युगीजांच्या २५ आणि फ्रेंचांच्या १५ पलटणी मागविल्याची पत्रे आणि त्यांना डॉन मॅन्युअलची होकारार्थी पोर्च्युगीज भाषेत उत्तरे यांचा बंदोबस्त बाळकोबा केळकराने पत्करला. त्यांत नागदेवराव हा प्रतापसिंहाचा वकील म्हणून डॉनला भेटला, असा संदर्भ असे. केळकराने पेडणे मुक्कामी छत्रपतीच्या नावाचे शिक्के बनवून घेतले. या कटात नागो देवरावचे पुतणे मेहुणे असे निकटचे आप्तसंबंधीच होते. शिवाय ओळखीपाळखीच्या अनेक लोकांची नांवे कागदात साक्षीदार म्हणून घुसडून त्यानाहि पुढे त्रांगड्यात ओढायला हे नातूभगत विसरले नाहीत.
आप्पासाहेब भोसल्याची ओव्हर-बौण्ड्री
प्रतापसिंहाचे मुख्य दुस्मान म्हणजे सातारा पुण्याचे सारे चित्पावन, त्यांच्या कच्छपी लागलेले किंवा अडकलेले इतरहि अनेक वैरी होते. पण सगळ्या दुस्मानांत पहिल्या नंबरचा डांबीस दुस्मान कोण असेल तर तो त्याचा धाकटा भाऊ उनाडटम्पू आप्पासाहेब भोसला. लाडविकसकट पूर्वीच्या तीनहि रसिदंटानी या छिनाल पोर्याचे भवितव्य ओळखले होते. याला खर्चासाठी प्रतापसिंह दरमहा साडेपाच हजार रुपये नियमीत देत असे. पण रंडीबाजी नि दारुबाजीत आकण्ठ बुडालेल्या या नराधमाला ती रक्कम काय पुरणार? तेव्हा तो नेहमी सावकारांकडून दमघाटीने हुकमी कर्ज काढीत असे. आपला भाऊ, त्यालाहि काही अधिकार असावे, म्हणून प्रतापसिंहाने त्याला अदालतीचा न्यायाधीश नेमले.
चोराच्या हाती जामदारखान्याच्या किल्ल्याच मिळाल्या. त्याने लाच खाण्याचा सपाटा चालवला, रयत हैराण झाली. लाडविकनेहि महाराजाकडे तक्रार केली. सावकारांचे तगादे लागले, म्हणजे आप्पासाहेब त्रागा करून सारा राजवाडा डोकीवर घ्यायचा आणि लोकलज्जेसाठी प्रतापसिंह त्याला मागेल त्या रकमा द्यायचा. एकदा असेच ३० हजार रुपये दिले. पण ते पुण्याच्या एका फडतूस गावभवानीला ते देणार असे समजताच त्याने हिसकावून परत घेतले. राजवाड्यात भावाभावांच्या रोज कटकटी चालायच्या. लोकांत त्यांची चर्चा चालायची. आप्पासाहेबाला दोन बायका होत्या. त्याच्या व्यसनातिरेकाने थोरलीचा (ताराबाईसाहेब) तो मनस्वी छळ करीत असे. त्याने एक पुण्याची कसबीण आणून सातार्यात ठेवली होती.
तिच्या चिथावणीने तो बायकोला रोज हाणमार करी. अखेर जिवाच्या भयाने ती प्रतापसिंहाच्या राणीच्या आसर्याने राहू लागली. या घटनेवर बाळाजीपंत नातूने ‘ती प्रतापसिंहाशी लागू आहे’ असा सगळीकडे बभ्रा केला. या आरोपाने प्रतापसिंह अतिशय दुःखी झाला. या घाणेरड्या मुद्याविषयी लंडन येथे डायरेक्टरांच्या कोर्दापुढे भाषण करताना माजी रसिदंट नि या वेळी एक डायरेक्टर मि. ब्रिग्ज संतापाने म्हणाला "हा अत्यंत बदनामी करणारा आरोप सर्वथैव खोटा आहे. हिंदुस्थानात असताना, शेकडो राजांचा नि माझा संबंध आला. पण त्या सर्वात सच्छील नि सद्वर्तनाबाबत प्रतापसिंहाची बरोबरी करणारा एकहि इसम मला आढळला नाही. तसेच शहाजी (आप्पासाहेबा) इतका स्त्रीलंपट असामी माझ्या पहाण्यात दुसरा नाही”. ब्रिग्जच्या या जाहीर विधानाला दुसरा रसिदंट रॉबर्टसन यानेहि सडेतोड भाषण करून पुष्टी दिली.
सर जॉन मालकम गवर्नर असताना नातूच्या चिथावणीने आप्पासाहेबाने राज्याच्या फाळणीचा अर्ज देऊन, अर्ध्या राज्याची मागणी केली होती. पण आपाला पुरेपूर ओळखणाऱ्या त्या समंजस गवर्नराने ती केराच्या टोपलीत भिरकावली होती. पण आता सर रॉबर्ट ग्रांट या खुनसट धार्मिक गवर्नराची अमदानी चालू होती. चिंतामणराव पटवर्धन नि नातू या तितक्याच खुनसट धर्ममार्तण्डांची नित्याची दोस्ती जमली होती. प्रतापसिंहाचे नि मुंबई सरकारचे वाकडे आले आहे. हा सगळीकडे गवगवा झालेला पहाताच आप्पा भोसल्याने मुंबई सरकारच्या आधारांत अशी एक बातमी दिली भिरकावून कीं त्या ओव्हर-बौण्ड्रीने तमाम महाराष्ट्र चकितच झाला. ‘प्रतापसिंहाने आपल्या मुंबईच्या एजंटाना पत्रे पाठवून अशी स्पष्ट सूचना दिलेली आहे की लंडनवाल्यानी जर आपले जहागीरदारांच्या पांध्यांचे काम नीट निकालात काढले नाही, तर तेथून ताबडतोब रशियाला जा. तेथल्या बादशहाला भेटून सांगा की आमचे साम्राज्य छप्पन कोटी रुपये उत्पन्नाचे आहे. तुम्ही भरपूर रशियन सैन्य घेऊन इराण काश्मीरच्या मार्गाने यावे, इंग्रेजाना हिंदुस्थानातून हुसकावून द्यावे. आम्हाला आमच्या पूर्वीच्या अफाट मऱ्हाठी साम्राज्याचे धनि करावे, या स्वारीचा जो खर्च येईल तो पैनपै हप्तेबंदीने आम्ही फेडून टाकू’ का, आहे की नाही नातू कंपूच्या कटबाजीवर ताण! कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्सच्या सभेपुढे आप्पाच्या या महामूर्ख करणीवर लाड़विकनेच पुढे ता. २९ जुलै १८४२ रोजी आवेशाचे भाषण करून आप्पा भोसल्यांच्या नालायकीचे अनेक पुरावे दिले. शिवाय नराधम नातूने सज्जन प्रतापसिंहाच्या शीलावर उडवलेल्या चिखलाचा कर्नल ब्रिग्ज, कर्नल रॉबर्टसन आणि थॉमसन यानी जळजळीत भाषेत निषेध केला, तेव्हाहि लाडविकने आपल्या जाहिर संतापाने त्या निषेधाला पाठिंबा दिला.
सर ग्रांटने लाडविकला गाढव बनवले
नातूच्या कारस्थानाचा गवर्नरने पुरस्कार करून त्याचा गुप्त शह लाडविकला लागेपर्यंत, प्रतापसिंहाशी लाडविकचे वागणे फार दोस्तीचे होते. जहागीरदारांविषयी डायरेक्टर बोर्डने राजाला दिलेल्या अनुकूल निकालाचे पत्र आणि पुढे मुद्दाम पाठविलेले सन्मानाचे पत्र आणि तलवार, ही सर रॉबर्ट ग्रांटाने दडपून टाकली, तरी तीं पत्रे नि तलवार मुंबईला आल्याची गुप्त खबर लाडविकनेच राजाला दिली होती. कारण त्या पत्रांतील मजकुराचा सारांश प्रतापसिंहाने ता. ६ मे १८३५ च्या आपल्या डायरीत लिहून ठेवला होता.
‘‘विलायतेहून पत्र आले त्यातील मजकूर कोर्ट उरकतरातून पत्र आले की गौरनर क्लार गेला व याचे (सर ग्रांटचे) नावे पत्र आले की माहाराज सरकारचे मुलकाचा बंदोबस्त व दौलतीचा व आदालतीचा व शालेचा वगैरे हरयेक बंदोबस्त चांगला आहे व याची खुशी फार वाटली, असे लाडविक साहेब यानी सांगत होते. व कर्ज करीत नाहीत, वखर्चहि ठीक आहे, व माहाली जाणे, जमाबंदीस जाणे हे रयेत हावालास ठीक आहे. व मेहनत व हुशारी व याविसी विलायेतेत फार खुसी वाटली. दरसाल हावाल वकिलाने गवरनरास लिहीत जावे. त्याणे विलायेतेस लिहिणे. सबब भाव लिहिला की देवीने ठीक केले व एकादे वेलेस लिहिणे जागा जाहाली, ही खुषी वाटली. परंतु फार जपून वागवणे व आकल देऊन देवी कृपेने पार असे. (५) कोर्ट डकतरातून पत्र आले की जाहागीरदाराविसी माहाराज सरकारचे सरहादीतचे व आमचे हादीत जे मुलुक आसेल तो आमचा, हे कोर्ट डकतर याणी लिहिले. यावरून हे गौरनर याचे पत्र (विलायतेहून उत्तरच आले नाही सांगणारे) खरे नये, असे दिसते. कोर्ट डकतर याणी लिहिले हेच खरे. गौरनर याचे हे लिहिणे बाद."
लाडविक जात्या सज्जन नि सरळ मनाचा होता. प्रतापसिंहाचा राज्यकारभार नि त्याचे खासगी व सार्वजनीक जीवन निर्दोष नि निर्मळ होते. जहागीरदारांसंबंधी त्याच्या हक्कांचा आग्रह वाजवी होता, त्या हक्काना मुंबई सरकारने शेकडो वेळा लेखी मान्यताहि दिलेल्या होत्या. डायरेक्टर बोर्डाने या बाबत राजाच्या मागणीलाच उचलून धरले होते, हे लाडविकला स्पष्ट दिसत होते. पण मुंबई सरकारच जेथे तहनाम्याच्या सरळ शब्दांवर उलट अर्थ बसवून, वाटेल त्या शक्याशक्य सबबीखाली राजाला सफाई उखडून टाकायलाच उठलेले, तेथे येईल तो गुप्त उघड हुकूम मान्य करण्यापलिकडले त्याच्या हातात काय होते? बाजूला सारून, अनेक गोष्टी चक्क मनाच्या विरुद्ध करणे त्याला आता भाग होते.
भाऊ लेल्या, बाळकोबा केळकर, नागो देवराव आणि चिंतामणराव सांगलीकर यांचा बनावट फितुरी कागदपत्रांचा व्यापार जोरात चालला होता नि त्यातले बरेचसे पुरावे हजारो रुपयांच्या खरेदीने मुंबई सरकार आणि कलकत्त्याच्या गवर्नर जनरलापर्यन्तसुद्धा जाऊन भिडले होते. सातारच्या पलटणीतला फितूर नुसता कागदोपत्री सिद्ध करण्यापेक्षा पलटणीतले दोनतीन अंमलदार बनवून त्यांच्याकडून प्रत्यक्षच तसे नाटक बसवून घेतले, तर पुराव्याचा खुंटा अधिक बळकट होईल, या विचाराने अंतोबा वाघ नावाच्या एका गावगुंड भटाला उभा करून, नातूने त्याहि नाटकाची उभारणी केली.
प्रकरण १६ वे
संत्री कटाच्या नाटकाची उभारणी
सातार्यात रेसिडेन्सी होऊन, तेथे कंपनीची एक पलटण कायमची राहिली. तेव्हापासून सातारा शहरात पलटणीच्या लोकांची आणि गोऱ्या मेजर आडजुटंटांची बरीच वरदळ चालू झाली. वेश्याव्यवसायाला ऊत आला. “साहेब लोक शहरात येऊन स्त्याने माणसास कमची मारतात... बुगी कलावंतीन इच्या पोरीना बोलावीतात" अशा लोकांच्या तक्रारी येऊ लागल्या. ‘‘विठोबापासी पारगावकर सावकार पालीत राहात असतो. त्याणे येऊन कलविले की वॉरण साहेब व येशवंतराव सरसुभेदार हे चवकसीस आले होते. ते वेलेस पारगावकर याणे आपले घरी वारणसाहेब आणला. पानसुपारी देऊन गेले. ते वेलेस त्याची घरची कुणबीण ईस नलात बोलावून पंचवीस रुपये दिल्हे. तिचेसंगे बदकर्म केले.’’ इतकेच काय पण पाचवे पलटणचा एक गोरा मेजर खुद्द महाराजाना भेटला. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यावर शहाणा काय सांगतो, ‘‘आम्हास नाच इकडले मुलकाचा चांगला लागतो. येक वेला दाखवावा. आम्हासहि विषयेयास बायेकू पाहिजे. जर पैका असता तरी लग्नच केले आसते. नाही, सबब दुसरेया बायका पाहिजेत."
पलटणीच्या असल्या लोकांचे हलकट धंदे सातार्यात चालू झाले. महाराजानी रसिदंटाच्या कानावर वरचेवर तक्रारी घालाव्या, त्यानी जरब द्यावी. काही काळ धिंगाणा बंद पडावा, पुन्हा ये रे माझ्या मागल्या. गावात किंवा गावानजीक पलटणी आल्या म्हणजे लोक हवालदिल होतात, याची कारणे उघड आहेत. धंदेवाईक वेश्यांच्या जोडीनेच हुंडग्या गरतीसुद्धा या हंगामात पैसा करतात आणि शिपायांची वरदळ शहराच्या गल्याकुच्यातून राजरोस होते. दुस्मानदारी, गुंडगिरी आणि राजकारणी हेवेदावे यांचे सूड उगविण्याचे कट अशा ठिकाणी तयार होतात आणि त्यांत वरून धुवट सोवळे दिसणारे अनेक संभावीत सामील होतात.
प्रतापसिंहाविरुद्ध पलटणीत फितूर केल्याचा आरोप ठसठशीत सिद्ध करण्यासाठी नातूने ज्या नाटकाच्या उभारणीचा उद्योग केला, त्यात त्याच्या हस्तकानी असल्याच गल्लीकुच्ची धुंडणार्या पलटणीतल्या सुभेदार शिपायांचा ‘नट’ म्हणून उपयोग केला. प्रतापसिंह वरचेवर या शिपुरडयांच्या हलकटपणाविरुद्ध आणि गुंडगिरी विरुद्ध रसिदंटाकडे लेखी तक्रार करुन त्याना चेपीत असल्यामुळे, ते त्याच्यावर नेहमी दातओठ खात असत. शिपायाना अटकाव झाला, म्हणजे त्यांच्या साजण्या नि साजिदे यांचाहि तिळपापड व्हायचा. महाराज कधि शहराबाहेर फिरायला निघाले का हे पलटनवाले त्याना ऐकू येईलशा आवाजाने एकमेकात बोलायचे, ‘अरे जा रे यार, इस चिडियोकू महिनेके अंदर बरबाद कर डालेंगे’ ही गोष्ट बाळाजी काशी किबेच्या मार्फत महाराजानी अनेक वेळा रसिदंदाच्या कानावर घातली पण किये पडला नाचा कावळा!तो एका कानाने ऐकायचा नि दुसऱ्याने बाहेर सोडायचा. रसिदट लाडविकने महाबळेश्वरावर गोविंदराव दिवाणाच्या बंगल्यासमोर शिपायांसाठी एक हंगामी चाळ बांधली. गोविंदरावाने आक्षेप घेतला. लाडविकने काढून टाकली. तेव्हा शिपाई-राजावर फार उखडले, दादजी कदम नावाचा महाराजांचा एक नोकर विहिरीवर आंघोळ करीत होता. त्याला काही सुभेदार म्हणाले, ‘आमच्या झोपड्या उखडल्या? ठीक पाहून घेऊ. सहा महिन्यात तुमच्या दिवाणाला नि महाराजाला बंगाल पंजाबची हवा दाखऊः याद रखो.’
महाराणीसाहेब एकदा माहुलीला कृष्णास्नानास गेल्या. उन्हाळा फार कडक पडला होता. म्हणून एका विस्तीर्ण वटवृक्षाखाली बैठक घालण्याचा तिने हुकूम केला. त्या जागेवर आधी काही पलटणचे शिपाई ऐसपैस बसले होते. हुजर्यानी त्यांना जरा दूर लांबवर बसायला सांगताच, ते एकदम उसळले आणि खुशाल महाराजाना नि महाराणीला शिव्या देऊ लागले. कारमान्याने त्याना शुद्धीवर आणण्याचा पुष्कळ यत्न केला, पण व्यर्थ! ‘आम्ही कंपनी सरकारचे शिपायी, विचारतो कोण या हिंदू राजाला! सहा महिन्यात तमाशा दिसेल.’ अशी त्यानी बडबड चालविली.
महाबळेश्वरावरच्या महाराजांच्या विहिरीवर तेथल्या व्यवस्थापकाने पाणी भरण्याची शिपायाना मनाई केली. कारण त्यात अनेक नहिंदु जातीचे शिपाई असायचे. बाटबाटीच्या नि विटाळाच्या कल्पना त्या वेळी फार. पाणी बंद केल्यावर, शिपायी रामगरीब गंगापुत्राला म्हणाले.- ‘राजाने आमचे पाणी बंद केले काय? सहा महिन्यात समजेल कोण कुणाला पाणी पाजतो ते.’
महाराजानी रसिदंडाला है सांगताच तो म्हणाला, ‘त्यांच्या बरळण्याकडे महाराजानी काय एवढे लक्ष द्यायचे.’ वास्तवीक प्रतापसिंहाला कसल्यातरी कचाट्यात अडकवून चेचण्याचा मुंबई गवर्नराचा निश्चय झालेला आहे आणि त्याप्रमाणे नातूच्या नानामुखी खटपटींची यंत्रे सारखी हालचाल करीत आहेत, याची लाडविकला चांगली खबर होती. भाऊ लेल्याच्या कंपूने तयार केलेली काही बनावट पत्रे पैदा करून, ती राजाच्या कारस्थानांचा पुरावा म्हणून मुंबईच्या सेक्रेटरीअटच्या गुप्त खात्यापर्यंत पोहचली होती. गवर्नर सर रॉबर्ट ग्राट नि त्याचे गोरे कौन्सिलर्स सातार्याहून महत्वाची खबर येते कधि नि आम्ही प्रतापसिंहावर धाड घालतो की, याची आतुरतेने वाट पहात होते.
नातूचे संत्री-कट नाटक
प्रतापसिंहाने गोव्याकडून पोर्च्युगीज पलटनी मागविण्याच्या कटाच्या उभारणीसाठी, संकेश्वर शंकराचार्याची दस्तऐवजी मान अडकवून, नागो देवराव आणि बाळकोबा तात्या केळकर यांची सांगलीकराने नि नातूने सावंतवाडीला आधीच रवानगी केलेली होती. आता खुद्द सातार्यासच छावणीतल्या पलटणी फितूर करण्याचे नाटक उमे करण्यासाठी नातूने अंताजी वाघ (हा अंतोबा अस्सल चित्पावन टाईप धान्या डोळयांचा असल्यामुळे, बर्याच ठिकाणी याचा `घार्या’, ‘घार्या घारे’ असाहि उल्लेख आलेला आहे.) नावाच्या एक उपद्व्यापी भटाला हाताशी धरले. त्या वेळी २३ वी नेटिव पलटण रेसिडेन्सीत छावणीला होती. ता. ११ जुलाई १८२६ सोमवारी अंताजी वाघाने शिवगुलामसिंग नावाच्या एका परदेशी सुभेदाराला गाठला. एकदम नमस्कार ठोकून, स्वारीने बोलायलाच सुरवात केली. "नमस्कार सुभेदारसाहेब, तुमच्या पलटणीच्या मेजर सुभेदारांची भेट घ्यायची आहे. त्यांचे नाव काय? अहो, मोठी गुप्त भानगड आहे. शपथ घेत असाल तर सांगतो. तुम्हाला पैकाहि रगड मिळेल." शिवगुलामची नि या चित्पावन अंताजीची यापूर्वी कधीच काही जानपछान नव्हती. तरीहि त्याने तात्काळ आणभाक केली. अंताजी म्हणाला.- "शिंद्याचा वकील आलाय सध्या सातारला. इंग्रज सरकारला हिंदुस्थानातून हुसकावून लावण्याचा बेत ठरलाय. सगळे देशी राजे एक झालेत. आमचे महाराज तर या कटाचे मुख्य सूत्रधार आहेत." पुन्हा १० दिवसांनी अंताजी शिवगुलामला त्याच्या बिर्हाडी छावणीत जाऊन भेटला. तेथे चंदरसिंग हवालदार होता. हेच आमचे आडजुटण्ट अशी शिवगुलामने थाप मारली नि अंताजीला बनवले. राजाच्या कटाबद्दल अंताजीची वटवट चालली असतानाच, शिवगुलामने चंदरसिंगाला खूण करून पाठून दिले. तो ले. स्टोकला जाऊन भेटला आणि अंताजीने आणलेली खबर त्याला कळविली. गोविंदराव दिवाणाने तुम्हाला भेटीला बोलावले आहे. माझ्याबरोबर चला असे अंताजी शिवगुलामला सांगत आहे तोंच चंदरसिंग हवालदार परत आला आणि स्टोक साहेबाने त्याला बोलावले आहे, असा निरोप दिला. शिवगुलाम गेला. स्टोकने त्याला अंताजीबरोबर गोविंदराव दिवाणाकडे जायला परवानगी दिली. पण गुलजार मिश्रालाहि बरोबर न्यायला सांगितले. शिवगुलामने ‘गुलजार मिश्र हमारे बचपन से बड़े प्यारे दोस्त’ अशी अंताजीजवळ प्रस्तावना केली आणि ही चौकडी गोविंदराव दिवाणाला भेटायला शहराकडे निघाली.
अंताजीने या तिघा परदेशी शिपायांना बगलेत मारून मोठे विचित्र नाटक रंगविले. दिवाणाच्या खेटराशीहि उभे राहण्याची अंत्या वाघाची लायकी नव्हती, तर तो त्याच्या भेटीगाठी काय घेणार? त्याने त्या शिपायाना दिवाणाच्या वाड्यांतला बाहेरचा भाग एकदा दाखवला. एकदा दुरून गोविंदराव कोण, महाराज कोणते, हे दाखवले. एकदा चोरून राजवाड्यांत नेले नि तेथले एकदोन दिवाणखाने दाखवले. नागपूरकर भोसल्याचे वकील आणि शिंद्याचे वकील म्हणून भलतेच लोक दाखवले. असा क्रम अनेक वेळा वरचेवर अंताजीने चालवून, आपल्या कपटनाटकात या तीन पात्रांचा ठाकठीक मिलाफ करून घेतला. नातूकडून मिळत गेलेल्या गुप्त दक्षणेचा मलिदा त्यांना आणि छावणीतल्या आडजुटण्ट लेफ्टनंटादि हापसराना धरून, त्यांच्याकडून फितुरी प्रकरणातले निरनिराळे प्रवेश चोख वठवून घेतले. ‘आज आम्हाला गोविंदराव दिवाण भेटले. उद्या ते महाराजांची मुलाखत करून देणार आहेत.’ नागपूरकर भोसल्याच्या आणि शिंद्याच्या वकीलाशी आजदिवाण अमूकतमूक बोलले, ते आम्ही ऐकले. ‘दिवाणाजवळ आज आम्ही शपथा घेतल्या.’
महाराजानी आम्हाला पलटणातले शिपायी कसे फोडावे आणि सूचना येताच बंडावा कसा करावा, याच्या सूचना दिल्या. असल्या थापा हे तीन शिपुरडे वरचेवर आपल्याहाफसराना देत आणि ते त्यांच्या जबान्या लिहून घेऊन लाडविकाकडे पाठवीत. एकदा अंताजी शिवगुलामसिंगाला बोलवायला आला असता तो होता पहार्यावर. मला येता येत नाही, असा त्याने जबाब दिला. लाडविकला ते समजताच त्याने ताबडतोब दुसरा शिपायी नेमून शिवगुलामला अंताजीबरोबर जाण्यासाठी मोकळा केला. यावरून या संत्री-फितुराच्या नाटकात रसिदंशापासून तो थेट कटबाज शिपुरपर्यन्त सारे रेसिडेन्सीवाले किती आतुरतेने भाग घेत होते. हे दिसून येते.
पलटणीच्या छावणीत है फितुरीचे नातू-नाटक अंताजी सूत्रधाराच्या खटपटीने रंगत होते, याची गोविंदराव दिवाण किंवा प्रतापसिंह याना दादहि नव्हती आणि अंत्या वाघासकट त्या तीन परदेशी शिपायांची तोंडओळखहि त्याना असण्याचे काही कारण नव्हते. कोठे महाराज नि गोविंदराव दिवाण आणि कोठे हे फाटक्या पायताणांचीहि लायकी नसलेले परदेशी शिरपुडे नि त्याचा तो सूत्रधार गांवगुंड अंत्या वाघ!
“आपापल्या राज्यातल्या इंग्रजी पलटणीतले देशी शिपाई फितूर करून ठेवण्याचे निरोप घेऊन, कित्येक दक्षिणी नि कर्नाटकी ब्राम्हण, अनेक वैषांतरानी, अनेक देशी राजेरजवाड्यांकडे महाराजानी गुप्तपणाने रवाना केले आहेत आणि आम्हालाहि तयारीत असायला सांगितले आहे." असे शिवगुलाम त्रयीने स्टोकला ता. २१ जुलाई १८३६ च्या रात्री कळविले. लगेच स्टोकने ही बातमी लाडविकला कळविली. त्याने ताबडतोब त्या तीन शिपायाना आपलेसमोर बोलाऊन, त्यांच्या जबान्या घेतल्या. तारखा, वार, वेळ, जागा. भेटी भाषणे, शपथा, मेजवान्या इत्यादि अंताजीने पढवून ठेवलेल्या तपशीलांसह त्या तिघानी पोपटाप्रमाणे धडाधड न काचरता, आपापल्या जबान्या दिल्या. लाडविक पुरा बनला. त्याने दुसर्या दिवशी ता. २२ जुलई रोजी “महाराजानी इंग्रजी पलटणीतले देशी शिपायी फितूर करण्याचा मोठा देशव्यापी कट केला असून, आमच्या पलटणीतल्या दोन सुभेदारानाहि डागळल्याच्या त्यांच्या जबान्यांच्या नकला सोबत पाठविल्या आहेत” असा तातडीचा खलिता खास सांडणीस्वाराबरोबर मुंबईला रवाना केला.
बस्स, सर रॉबर्ट ग्रांटला जे हवे होते ते मिळतांच, त्याचा आनंद चर्चचा घुमट फोडून आकाशातल्या बापापर्यन्त जाऊन भिडला. त्याने तडाड ता. २४ जुलईलाच उलट जबाब दिला की "आपण फार चांगली माहिती दिलीत, पण इतक्यातच या प्रकरणाचा गवगवा होऊ देऊ नका. आणखी जितका पुरावा मिळेल तितका मिळवा आणि या कटाची माहिती देणाऱ्या अंताजीला त्याच्या साथीदारांसह ताबडतोब अटक करा. कैदी असाम्यांच्या घरांच्या झडत्या घ्या. कागदपत्र जप्त करा. आपल्या सुभेदारानाहि नजरेखाली ठेवा, कारण राजाला ही कुणकुण लागली तर तो या लोकाना पकडून सगळा डाव उलथून टाकण्याचा फार संभव आहे."
प्रकरण एवढ्या थराला गेल्यावर अंताजी भेदरला आणि तो आपल्या सुभेदार दोस्ताना भेटण्याची टाळाटाळ करू लागला. कसेहि करून अंताजीला छावणीत आणण्याबद्दल लाडविक सुभेदाराना आग्रह करू लागला आणि अंताजी तर कोठेच सापडे ना! कधी चुकून कोठे भेटलाच तर थापा मारून निसटायचा. अंताजीच्या भेटायच्या जेवढ्या जेवढ्या म्हणून जागा होत्या. तेथे तेथे सुभेदार सारखे टेहळणी ठेवू लागले. त्याचा भाचा परशराम याचे सुगंधी सामानाचे दुकान होते. तेथे एकदा ६ आक्टोबर १८३६ रोजी चंदरसिंगाने अंताजीला दुरून पाहिला नि चटकन एक इसम पाठवून दूर असलेल्या शिवगुलामसिंगाला इषारा दिला. शिवगुलामने अंताजीला गोडगोड बोलून, एक थाप दिली. आमच्या छावणीतल्या एका हापसराची बदली झाली आहे. त्याची एक दुभती गाय विकायची आहे. तू आलास तर थोडक्यात सौदा पटवून देतो. शंभराची गाय पंचविसात मिळेल. भटाच्या तोंडाला पाणी सुटले. तो आणि परशराम सुभेदाराबरोबर छावणीत जाताच, दोघांच्या हातांत बेड्या पडल्या, लाडविकने त्यांच्या जबान्या घेतल्या. मुंबईला खलिता रवाना झाला
गवर्नर ग्रांटची लगीनघाई
प्रकरण येथवर येईपर्यन्त क्रिस्तभगत सर रॉबर्ट ग्रांट याला कोठचा धीर निघायला. प्रतापसिंहाचा गळा कापतो कधी आणि त्याचे रक्त पितो कधि, अशी या अर्कट इंग्रेजाला अगदी तहान लागली होती. त्याने १५ सप्टेंबर १८३६ लाच कंपनीच्या लंडनच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सच्या गुप्त समितीला मोठे मानभावीपणाचे गुप्तपत्र पाठवून ‘सातारचा राजा प्रतापसिंह याने देशी शिपायांत फितूर फैलावण्याचा कट केल्याचे’ पुरावे हाती आल्याबद्दल नक्राश्रु गाळले. आपण पुढे जो खाटीकखाना चालू करणार, त्याला लंडनच्या वरिष्ठांची हरकत राहू नये आणि राजाबद्दलहि त्याचे मन पुरेपूर कलुषित व्हावे, असा सर रॉबर्टने पक्का बंदोबस्त केला. इतकेच नव्हे तर गोविंदराव दिवाणाला शक्य तितक्या लवकर अटक करावी असाहि हुकूम त्याने लाडविकला पाठविलेला होता. दिवाणालाच अटकेत टाकले म्हणजे प्रतिवाद करण्याच्या कामात राजा लंगडा पडेल, अशी ही आंग्रेजी शहाणपणाची तरतूद होती. अंताजी नि परशराम यांना अटक करून, त्यांच्या जबान्या घेतल्यावर लाडविकची नजर गोविंदराव दिवाणाकडे वळली.
राजवाड्याला लष्करचा वेढा
संत्रीकटाचे नाटक इतके सपाटेबंद रंगले तरी त्याची दिवाणाला नि महाराजाना दादहि नव्हती. जहागिरदारांच्या वादाचे कागद तयार करून मुंबईत बसलेल्या रंगो बापूजीच्या मार्फत डॉ. मिलनला देण्यासाठी, ते दोघे रात्रंदिवस कागदांच्या रुमालांची उलथापालथ करीत होते. शुक्रवार ता. ७ आकटोबर १८३६ उजाडला. बिचारा गोविंदराव दिवाण मोठ्या पहाटे उठून मुंबईला पाठविण्याच्या कागदांची जुळणी करीत आपल्या वाड्यात कार्यमग्न होता. इकडे प्रतापसिंह महाराज स्नान उरकून नित्याप्रमाणे देवघरात संध्यावंदन करीत होते. एकाएकी राजवाड्याबाहेर मोठा गलका ऐकू आला. रेसिडेन्सीचे लष्कर आणि तोफांच्या गाड्या खडाड कर्कश आवाज करीत राजवाड्याकडे धावत येत होत्या. त्यांचा राजवाड्याला गराडा पडला.
रेसिडेन्सीतले एक कामदार बाळाजी काशी किबे अंग्रेजी हापिसराच्या मिजाशीने पहारेकऱ्याना न जुमानता एकदम राजवाड्यातल्या देवघरात घुसू लागले. हुजर्याने आडविले, तेव्हा, ‘अरे, आडवतोस कशाला? आता आडवणार कोणकोणाला?’ असे दरडावून किये महाराजासमोर जाऊन उभा राहिला. ‘महाराज संध्या ठेवा बाजूला. बाहेर या जरा. जरूरीचे काम आहे.` असे किबे हुकमाच्या आवाजात म्हणाला. प्रतापसिंहाला काही उलगडाच होईना. इतक्यात राजवाड्याला लष्कराने वेढा दिल्याची बातमी हुजर्याने येऊन महाराजाना सांगितली. `कायहो किबे, काय भानगड आहे?’ असे महाराज विचारणार, तोंच स्वतः लाडविक एकदम आला.
लाडदिक- देखो महाराज हमारे सण्ट्रीमे गोविंदराव डिवानने कुछ फिटूरका काम किया ऐसा अंदेशा है. हम डिवानकू मंगटा है.
प्रताप- फितूर? आणि तो दिवाणाने केला?
लाडविक- हो हो, हम क्या झूट बाट बोल्टा है? हम डिवानको मंगटा है.
प्रताप- मग तेवढ्यासाठी हा लष्कराचा दंगा कशाला हवा होता? निरोप येताच पाठवून दिले असते.
गोविंदरावाला लष्कराने पकडून भर शहरात घेऊन यावे, अशी नातूकंपूची लाडविकला चिथावणी होती आणि त्याने तसा हट्टहि धरला. पण प्रतापसिंह एकदम चिडला असे पहातांच ‘दिवाणाना लवकर पाठवून द्या.` एवढेच सांगून तो लष्करासह परत गेला.
महाराजानी गोविंदरावाला निरोप पाठवून छावणीत रसिदंटाच्या भेटीला जाण्याची आज्ञा केली. दोन इभ्रतदार दरबारी इसम बरोबर घेऊन, गोविंदराव छावणीत जातांच, त्याना ताबडतोब कैद करून, गोविदरावाला दारूगोळा ठेवण्याच्या एक-दरवाजी खोलीत बंदिस्त केले आणि बाहेर नागव्या संगिनीचा पहारा ठेवला. दिवाण कैद होतांच, रसिदंटाने एकदम सातार्यात अनेक लोकांची धरपकड सुरू केली. राजधानीत एकच हाहाकार उडाला. महाराजांची सत्ता धाब्यावर बसवून, मन मानेल त्याच्या घराची झडती घेण्याचा सपाटा चालू झाला.
मुंबईहून गोरे ‘न्यायाधीश’ निघाले
इकडे हा प्रकार चालू असतानाच, तिकडे मुंबईहून गवर्नरच्या हुकुमाने विलोबी सेक्रेटरी आणि कर्नल ओव्हन्स हे दोन गोरे शहाणे न्यायाधीश घोड्यावर स्वार होऊन ५० स्वारांसह, दौडा मारीत सातार्याकडे निघाले होते. प्रतापसिंहाच्या कटाची चौकशी करायला सर रॉबर्टने हे दोघे आणि तिसरा रसिदंट लाडविक यांचे एक गुप्त चौकशी कमिशन न्यायाधीश म्हणून नेमून पाठविले. राजाविरुद्ध जहागिरदारांचा प्रश्न खुंटीवर टांगणारा विलोबी, हा गवर्नरचा सेक्रेटरी, अर्थात तो आपल्या नाठाळ वरिष्ठाचेच फत्तरी काळीज नि मत्सराचा काळा चष्मा चढवून आलेला. दुसरा ले. कर्नल ओव्हान्स. मुंबईच्या फौजेचा हा क्वार्टर मास्टर जनरल होता. ‘हिंदुस्थान सरकारच्या राजकारणी खात्याचे तोंड काळे करणारा हा ठगांतला ठग होता,’ असे इंग्रजी बखरकार म्हणतात. म्हणूनच सर ग्रांटाने त्याची भरपूर कानफुंकणी करून आणि हे चौकशीचे काम ठाकठीक पार पाडलेस तर तुलाच सातार्याचा रसिदंट करीन अशी आशा लावून, या कमिशनरांच्या टोळीत पाठवून दिले. तिसरा न्यायाधीश कोण? तर खुद लाडविक रसिदंट, म्हणजे फिर्यादीच न्यायाधीश बनले. इतकेच नव्हे तर या कमिशनच्या अध्यक्षपदाचा मान लाडविकलाच दिला होता.
चौकशीचा आंग्लाई फार्स
तू नाही शिव्या दिल्यास, तर तुझ्या बापाने दिल्या, या लांडगा नि मेण्डराच्या गोष्टीप्रमाणेच ही चौकशी आंग्लाई कारवायी होती. ता. १२ ऑकटोबर पासून ते ४ नवंबर १८३६ पर्यन्त तबल एकवीस दिवस चौकशी चालली होती. आरोपी गोविंदराव दिवाण आणि साक्षीदार अवघे तीन, महाराजातर्फे अगर गोविंदरावातर्फे साक्षीदारांची उलटतपासणी वगैरे काहीएक झाली नाही. आमच्या बाजूने चौकशीचे काम पहाण्यासाठी आणि साक्षीदारांची उलटतपासणी करण्यासाठी वकील घ्यावा, ही महाराजांची विनंती सुद्धा घुडकाऊन लावण्यात आली. मग २१ दिवस काय चालले होते? साक्षीदारांच्या परस्पर जबान्यांची जुळवाजुळव आणि आरोप शाबीत करण्यासाठी कोणी कायकाय बोलले पाहिजे, याच्या रोजच्या रोज रंगीतालमी चालू होत्या. अखेर परस्परविरोधी जबान्यांचा भंबाळा उडाला तो उडालाच. पहिला साक्षीदार शिवगुलामसिंग कमिशनपुढे येऊन उभा रहाताच त्याची तर घाबरगुंडीच उडाली. आंगाला घाम फुटून तो लटलटा कापू लागला.
तोंडातून एक शब्दहि निघे ना! विलोबी नि ओव्हान्स लागले एकमेकाच्या थोबाडाकडे पहायला, साक्षीदारच लटपटू लागले, तर उभारलेला सारा पत्त्याचा डावच उधळण्याची वेळ आली! तशात अध्यक्ष लाडविकने त्याला खोचून खोचून सूचक प्रश्न विचारताच शिवगुलाम मटकन खालीच बसला. भांबावल्यामुळे त्याच्या डोळ्यापुढे काजवे चमकू लागले. घसा कोरडा पडला. विलोबी नि ओव्हान्सने रागरंग पाहून, लाडविकला ‘तुम्ही काहीच विचारू नका.’ असे सुचवून, दोघानी शिवगुलागला धीर दिला. शिवगुलामला सोयीस्कर असे सूचक प्रश्न विचारून, ‘होय ना? होय म्हण’. ‘नाही ना? नाही म्हण.` अशा पद्धतीने २१ दिवसांत ३ साक्षीदारांचे पुरावे कसेबसे लिहून हा चौकशीचा फार्स उरकला. या विषयी पुढे डायरेक्टर बोर्डापुढे साक्ष देताना लाडविकने स्पष्ट कबुल केले की "या साक्षीदारांची जर उलट तपासणी झाली असती, तर त्यांच्या जबान्यांतल्या एकेका शब्दाचे राईराई एवढे तुकडे उडाले असते. शिवगुलाम आणि गुलजार मिश्र साक्षीला आले तेव्हा त्यांचे चेहरे प्रेतासारखे काळवंडलेले दिसत होते." बरोबरच आहे. सगळेच मुळी काल्पनीक नाटक, २९ आक्टोबरला लाडविकने महाराजास बोलावून, साक्षीदारांच्या जबान्यांचा सारांश तोंडी सांगितला.
महाराजानी नकला मागितल्या, देतो असे सांगूनहि मुळीच दिल्या नाहीत. त्या पुढे रंगो बापूजीच्या हातात सन १८४२ साली लंडनला आल्या. त्या सरकारी खर्चाने पार्लमेण्टरी पेपर्समध्ये छापल्या गेल्या. त्यावर रंगो बापूजीने आणि त्याच्या मदतगार सर जोसेफ ह्यूम, जॉर्ज थॉम्प्सन वगैरे मंडळीनी फार कडाक्याचा वाद करून डायरेक्टर बोर्डाला लज्जेने खाली माना घालायला लावली. याच वेळी, कर्नल लाडविकने डायरेक्टराना पत्र पाठवून कळविले की “प्रतापसिंहाने गुन्हा केला, अशी माझी खात्री नव्हती. तरी कमिशनच्या ठरावावर भिन्न मत लिहिण्याऐवजी मी नुसती सही केली, याचा मला आता खेद वाटून पश्चात्ताप होत आहे. यावज्जन्मात ती मी एक मोठी चूक केली, असे मी समजतो." हजारो जाहीर व्याख्यानांपैकी रंगो बापूजीचे २ डिसम्बर १८४६ रोजी लंडन येथे दिलेले एक महत्वाचे व्याख्यान परिशिष्टात दिलेले आहे. त्यात या तर्कटी कमिशनची कारवायी, साक्षीदारांचा फजितवाडा वगैरे सगळ्याच भानगडींची मुद्देसूद भंबेरी उडविली असल्यामुळे त्याबाबत विशेष तपशिलाने येथे जागा अडविण्याचे कारण नाही.
कमिशनरनी अंताजी वाघाबद्दल “Untajee was a man of the grossest the most worthless and unprincipled character, guilty prevarication and deceit, on whom it was impossible to place any reliance." (भावार्थ. अंताजी पक्का हलकट नि टग्या बनवाबनवी आणि लुच्चेगिरीत बिलंद असामी. त्याच्यावर विश्वास ठेवणे फार धोक्याचे.) असे उद्गार नमूद करून ठेवले. पण त्याच हलकटाने उभारलेल्या सुभेदारांच्या कटावर मात्र त्या तीन धूर्ताचा विश्वास बसला. एक गोष्ट मात्र लक्षांत घेण्यासारखी झाली, या सर्व फितुरी प्रकरणांचा मूळ उत्पादक आणि सूत्रधार जो बाळाजीपंत नातू, त्याचा या चौकशीच्या लांबलचक ताग्याच्या एकाहि धाग्यात चुकूनसुद्धा कोठे संदर्भाचा वास लागला नाही. मात्र, अगदीच नाही असे नव्हे. कारण नातूची कसलीच जबानी नसेल, तर कारस्थानाला जोरच लागायचा नाही. मग ती जबानी गुप्त ठेवण्यात आली तरी चालेल. नातूने ज्या जबान्या दिल्या नि कमिशनरानी गुप्त ठेवल्या. त्या पुढे रंगो बापूजीने लंडनला अस्सल दस्तऐवजी उघडकीस आणल्या. त्या अशा.-
(१) या बारा महिन्यामागे मला मजकूर समजला की मुधोजी भोसले नागपुराहून काढलेले राजे हल्ली जोतपुरात आहेत. त्याची पत्रे राजास आली व सातारच्या राजानी उत्तरे पाठविली व हैदराबाद व उदेपूर व नागपूर व गोवा (येथे) या कामाचीहि तजवीज चालविली आहे. कारण राजाचे मनात आले आहे की आपले राज्य मोठे व्हावे आणि इंग्रेजास या मुलकातून काढून टाकावे आसे आहे. रोज गुदस्त राजाचे बंधु आपासाहेब याणी मला सांगितले की मुधोजी भोसले याची पत्रे माहाराजास व सेनापतीस सिवानंद शास्त्री वगैरे याजबरोबर आली. परंतु ती राजानी जालली. त्यास तीन दिवस जाहले. (३१-१०-१८३६)
(२) माहाराजाचे तर्फेनी नागो देवराय वैद्य आणि दुसरे लोक गोव्यास जातात येतात. त्याजबरावर माहाराजानी घोडा व पोषाख गोवे गवरनरास पाठविला होता. हा मजकूर कोणी राबर्टसन साहेबास समजाविला. मला साहेबानी सांगितले की माहराज या कामावरून राज्ये बुडवितील. याजकरिता तुम्ही जाऊन राजास सांगावे की हे काम तुम्ही करिता परंतु या सबबीवरून तुम्हास बहुत इजा होईल. त्या वेली मी राबर्टसन साहेबास सांगितले की या फितुरीचा मजकुर मी जाऊन माहराजास सांगितले असता, ही खबर तुम्हास कोठून आली, आसे विचारितील तेव्हा मी सांगेन की साहेबाचे तर्फेनी आली. वगैरे. (ता. ५-२-१८३८)
नातूच्या जवानीचा हा कागद रंगो बापूजीने डायरेक्टर कोर्टाच्या भरसभेत कर्नल रॉबर्टसनला दाखवितांच तो इतका उसळला की नातूच्या या हलकट खोटेपणाबद्दल त्याच्या मागच्या पुढच्या चारीपिढ्यांचा त्याने उद्धार केला.
चौकशीच्या फार्सनंतर
गोविंदराव दिवाणाला एकदम पुण्याला नेले आणि तेथून अहमदनगरच्या तुरूंगात ठेवले. गुन्हा कबूल करावा म्हणून तेथे त्याचे मनस्वी हाल करण्यात आले. महाराजाना ‘जबान्यांच्या नकला देतो’ म्हणून सांगितलेतरी त्या दिल्या नाहीत आणि विलोबी नि ओव्हन्स या शिष्ठानी, रिवाजाप्रमाणे, मुंबईला परतण्यापूर्वी, आश्वासन देऊनहि, महाराजाना परतभेट न देता, तडक निघून गेले. गवर्नरला सालाबादप्रमाणे, रसिदंटाच्या परवानगीशिवाय, पोषाक पाठविण्याचा प्रघात तो यंदा लाङविकचा सल्ला घेऊन मुंबईला पाठविला. गवर्नराची भेट झाल्यावर त्याच्या कानावर एकंदर आगळिकीचा तपशील आपल्या प्रतिनिधीने घालावा, हा महाराजांचा हेतू पण सर ग्रांट न्यायनीतीचे श्राद्ध घालून बसलेला. त्याने पोषाक घेऊन येणाराला तीन महिने मुंबईत लोंबकळत ठेवले आणि अखेर एका सेक्रेटरीमार्फत ‘पोषाक घेण्याची गवर्नरसाहेबांची मर्जी नाही`, असा उद्धट जबाब देऊन परत पाठवले. यावर "चपराशा इतका मगदूर राहिला नाही ही गोष्ट बिनतोड आहे." असे प्रतापसिंहाने आपल्या डायरीत लिहिले.
और पुरावा मगटा है
चौकशीच्या फर्सात गोविंदरावला किंवा महाराजांना एका शब्दानेहि विचारले नसता कमिशनच्या त्र्ययाणा धूर्तनाम शहाण्यानी "महाराजाविरुद्ध केलेले आरोप त्याना मुळीच खोडून टाकता आले नाहीत." असा अजीबात खोटा शेरा मारून ठेवण्यात माणुसकीचीहि लाज बाळगली नाही. एकतर्फी पुरावा पुरेसा नाही, तेव्हा प्रत्यक्ष प्रतापसिंहाला अडकविण्यासाठी सर ग्रांटाने २४ जुलाई १८३६ च्या एका महानगुप्त पत्रातच लाडविकला काही सूचना केल्या होत्या. त्या अशा- ‘सुभेदारानी महाराजाना भेटावे. महाराज, आम्ही या कटाची उभारणी शुद्ध हेतूने केली. पण सारे बेण्ड फुटले. आता आमचा बचाव करा. पळून जावे तर जवळ पैका नाही. निदान आम्हाला दुसरीकडे कोठे नोकरी मिळण्यासाठी हुजूरनी शिक्का मोर्तबाची शिफारसपत्रे तरी द्यावी. महाराजानी त्याना पैसा दिला म्हणजे पुरावा भक्कम झाला. शिक्कामोर्तबाचे शिफारसपत्र दिले. तरीहि पुरावा पक्का झाला.` या सूचना अमलात आणण्याची लाडविकला सवड झाली नाही. तरीहि चौकशी चालली असता शिवगुलागसिंगादि तिघांनी लखोटा पोचविण्याच्या निमित्ताने महाराजांची एकांती भेट घेण्याचा ढालगजपणा केला. पण बळवंतराव सेनापतीने त्यांना आंगणातूनच हुसकावून दिले
लाडविकची सारवासारव
यानंतर प्रतापसिंह सहाजीकच उद्विग्न होऊन रसिदंटाला तो भेटनासा झाला. १२ नवंबर १८३६ ला बळवंतराव सेनापतीला लाडविक म्हणाला, ‘संत्री लोकानी मला आधी कळविले असते, तर मुळातच मी मिटवामिटव केली असती. पण लेकाच्यानी आपल्या पलटणीच्या हापसराना कळविले आणि त्यानी वरिष्ठांकडे रिपोर्ट केला. माझा इलाज राहिला नाही. अहो, हल्लीचे हे साहेबलोक पूर्वीच्या अलपिष्टनादिकासारखे थोडेच आहेत! दुसर्याला बुडवून सरकारचा फायदा करणारे.` त्यावर प्रतापसिंह डायरीत म्हणतो. साहेबलोक दिवसेदिवस आसेच फायदे करणारे यावयाचे. तेव्हा यांची अस्ता धरून तरी उपयोग काय? सारांश, प्रतापसिंहाचा हात आंग्रेजी यंत्राच्या दात्यात सापडला. पुढे तो त्यात कसा सफाई चिरडला गेला, हे पहायचे आहे.
प्रकरण १७ वे
ओता, ओता आणखी तेल ओता
गोविंदराव विठ्ठल महाजनी ऊर्फ गोविंदराव दिवाण याला एकाकी कैद केल्यामुळे. प्रतापसिंहाचा एक हातच तोडल्यासारखे झाले. तरीहि बळवंतराव मल्हार चिटणिसाने कंबर बांधून, सातार्याला चाललेल्या यच्चावत भानगडींच्या माहितीचे कागद रोजच्या रोज तयार करून मुंबईला रंगो बापूजीकडे पाठविण्याचे काम चालू ठेवले होते. रंगोबाने मुंबईला आपल्या वकिलातीचे एक सेक्रेटरिअट हापीसच उघडले होते. डॉक्टर जॉन मिल्न, एम, डी (प्रेसिडेंट मेडिकल बोर्ड) हा कंपनीचा पेनशनर गोरा अधिकारी रंगोबाला मनोभावाने सहाय देत होता. गुप्त कमिशनचा फार्स, अधिकाऱ्यांच्या धरपकडी वगैरे इत्यंबूत तपशीलाच्या तक्रारी डॉ. मिलन मुंबई गवर्नर आणि कलकत्त्याचे बड़ेलाट यांच्याकडे स्वताच्या सहीने पाठवू लागला.
कंपनी सरकारच्या एका गोर्या अधिकारी पेनशनरानेच हिंदू राजाची बाजू घेऊन अट्टहासाने सरकारशी भांडायला उठावे. हे पाहून सर ग्रांट नि त्याची कोणसिलदारांची प्रभावळ यांची डोकीं भणाणली. डॉ. मिलनने सातार्याला भेट देण्याची परवानगी मागितली. ती मुंबई सरकारने नाकारली. रंगो बापूजीगेहि सेक्रेटरिअरच्या अंतर्भागातल्या हालचालींची गुप्तः बातमी काढण्याची यंत्रेतंत्रे ठाकठीक बसऊन ठेवली होती. त्यांची माहिती सांकेतिक भाषेत तो सातार्याला वरचेवर कळवीत असे.
लाडविकला उखडला
प्रतापसिंहाची बाजू बळकट आहे आणि तो कलकत्ता अगर लंडनला वकील पाठवून, अगर डॉ. मिलन सारख्या वजनदार पेनशनराकडून तिकडे लेखी तक्रारी करील, तर राजाला अनुकूल अशी आलेली डायरेक्टर बोर्डाची उत्तरे आणि सन्मानाची तलवार आपण दाबून ठेवली, हे बेण्ड फुटून आपली नाचक्की होणार, हे सर ग्रांट आणि नातूच्या पचनी पडलेल्या त्याच्या प्रभावळीला चांगले माहीत होते. रसिदंट लाडविक पहावा, तर तो बेटा साधा सरळ गडी. छक्केपणे त्याला माहीत नाहीत. शिवाय, गुप्त कमिशनची एकतर्फी चौकशी चालली असता, त्याने साक्षीदाराना उलटसुलट प्रश्न विचारून सत्यशोधनाचा प्रयत्न करताना, कमिशनचा सारा डोल्हाराच उलथण्याचा प्रसंग कसा आणला होता, ते विलोबी नि ओव्हान्सनी नेक नामदाराना खुलाशाने सांगितलेच होते. तेव्हा असला माणूस रसिदंटीच्या जागेवर राहिल्यास, प्रतापसिंहाला चिरडण्याचे आपले कारस्थान तडीला जाणार नाही, हा पोच ठेऊन, सर ग्रांटाने लाडविकला प्रथम प्रकृति बरी नाही अशी सबब लिहून पाठविण्याचा मंत्र दिला. `माझ्या प्रकृतीला काय धाड झाली आहे? मी खोटा अर्ज करणार नाही.` असे त्याने स्पष्ट सांगितले. पुढे लाडविक एका पत्रात सापडला. त्याने `हल्ली राजा मला भेटेनासा झाला आहे. त्याचा माझ्यावर भरंसा असलेला दिसत नाही.` अशा मजकुराचे साधे पत्र गवर्नराकडे पाठविताच. तहनाम्यातील राजा रसिदंट- स्नेहाच्या मुद्यावर बोट ठेऊन, त्याची तडाड बदली केली आणि ओव्हान्सला त्याच्या कामाचा चार्ज घ्यायला रवाना केला. (१४-१५ जून १८३७).
ओव्हान्स म्हणजे रॉबर्ट ग्रांटाचा नि नातूचा पक्का पित्त्या, चाण्डाळ चौकडीची साखळी आता अव्वल अखेर बिनतोड जमली. परळच्या गवर्नमेण्ट हौसपासून तो थेट सातार्याच्या रेसिडेन्सीपर्यंत नातूचे कारस्थानक्षेत्र बिनअटकाव नि बिनबोभाट चालू झाले. गुप्तचौकशीचे एवढे मोठे नाटक केले. पण अखेर ते आंगावरच शेकणार, तेव्हा त्यातल्या साक्षीदारांच्या मुद्याना उपयोगी पडतील, असे आणखी दस्तऐवजी पुरावे जमा करण्याची कामगिरी ओव्हान्स आपल्या खिशात घेऊन आला.
भाऊ लेल्याचे पांढरे उखळ
मुंबई सातार्यात ही सरकार दरबारी बाचाबाच चालली असतानाच, भाऊ लेल्याचा बनावट कागदपत्र विकण्याचा ‘वेदोक्त’ धंदा चालूच होता. ओवान्स येण्याच्या सुमारास त्याने छावणीत विंग्रजी शिकायला जाणार्या पांडोबा नावाच्या एका भटाच्या पोरामार्फत, लैन आडजुटण्ट कॅपटन डराक याच्याशी वळण बांधून ‘साहेब मला जमीनजुमला, रोख बक्षिस वगैरे देतील तर राजाच्या फितुरीचे अस्सल कागद मी आणून देतो.` अशी सौद्याची भाषा करून ठेवली होती. ओवान्सला हे कळताच, भाऊ लेले मागेल ती रक्कम देऊन, मिळतील तेवढे कागद पैदा करायला त्याने डराकला सांगितले. लेल्याची तोंडओळख नसताहि आणि रसिडंटीवर येऊन अवघे २४ तासहि झाले असतील नसतील तोच ओयान्स लेल्यासारख्या गावगुंडाला कॅ. डराकमार्फत रोख रुपये आणि काम फत्ते झाल्यावर इनामजमीन व रोकड बक्षिसाचे वचनपत्र लिहवून देतो, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे.
लेल्याची महाराजावर कुरघोडी
भाऊ लेले एवढेच करून थांबला नाही. थांबणार कसा? श्रीयुत नरसोपंत केळकर ३ आगष्ट १९२०च्या केसरीत चित्पावनांविषयी लिहितात- “ते (चित्पावन) स्वावलंबी, मेहनती, कोठेहि पुढे घुसणारे, दीर्घ सूचना मनांत आणणारे, पण कांही अंशी आपल्यापुरते पहाणारे बुद्धीमान पण संकुचित दिलाचे लोक आहेत.” बाळाजीपंत नातू काय, कै. विश्वनाथपंत राजवाड्यांचे शतकृत्य करणारे अग्रेसर नरपुंगव चिंतामणराव सांगलीकर काय अथवा भाऊ लेले, नागो देवराव, किबे, जोशी वगैरे जवानमर्द ब्राम्हणभाई काय, एकजात सारे नरसोपंतांच्या या व्याख्येत ठाकठीक बसणारे.
कॅ. डराकच्या मार्फत ओवान्सकडून भाऊ लेल्याने बनावट फितुरी पत्रांचा सौदा करून १५० रुपये बयाणा घेतलाच. तरीहि अमृत गणेश खडमकर नावाच्या एका इसमाला गाठून, त्याने आणखी एक छातीठोक काम केले. अमृतरावाच्या मार्फत त्याने थेट प्रतापसिंह महाराजानाच निरोप पाठवला की ‘‘सरकारचे नावची सीक्क्यासुद्धा फितूर प्रकरणी पत्रे तमाम सावकारलोक याजला आज्ञापत्रे गेली. त्यापैकी एकदोन पत्रे माजे जवळ आहेत. परंतु माहाराज सरकारनी याज बाबत बक्षीस रुपये पंचवीस हजार दिल्हे तरी मी देईन. नाहीपेक्षा मी पत्रे इंग्रजी सरकारास दाखवून बक्षिस तिकडून घेईन." आहे का नाही भाऊ लेले स्वावलंबी, मेहनती नि कोठेहि पुढे घुसणारा?
ओवान्सचा सौदा ता. १४ नि १८ जून १८३७ रोजी झाला. ता. १५ रोजीच त्याने रसिदंटाचा चार्ज घेतला. खडमकराने लेल्याचा निरोप महाराजाना कळवून, ताबडतोब लेल्याला महाराजापुढे उभे केले. चिटणीसाने त्याची जबानी लिहून घेतली. जबानीची नकल रंगो बापूजीकडे मुंबईला रवाना झाली. ती लगेच डॉ. मिलन यानी ‘बंगाल सरकारचे हुकुमावरून मुंबई कौसलातून ता. १८ सप्तंबर सन १८३७ चे पत्राबराबर रवाना केली.’ ही बातमी ओवान्सला लागताच त्याने लेल्याला एकदम अटक करून, काहीतरी नवीन जबान्या लिहून घेतल्या नि मोकळा केला. पण हा बनावट पत्रांचा गडबडगुंडा डॉ. मिलनमार्फत कलकत्त्यापर्यन्त पोहचला.
कबुलीजबाबासाठी दिवाणाचा छळ
गोविंदरावाने गुप्त कमिशनपुढे “फितुरीचा आरोप खोटा, बनावट आहे साक्षीदारांची उलट तपासणी मला करू द्या. तुमचा सगळा व्यूह मी ढासळून दाखवतो." असे स्पष्ट सांगितले. त्यावर, ‘नातू म्हणतात तसा जबाब लिहून द्यावा, मुक्तता होईल, शिवाय स्वतंत्र जहागीर इनाम मिळेल` वगैरे लालूच दाखविली. पण गोविंदराव सत्याला नि खाल्लेल्या अन्नाला पाठ दाखवी ना. म्हणून त्याला पुण्यास नेऊन, तेथेहि समजावणीचा प्रयोग करून तो फुकट गेल्यावर त्याला अहमदनगरला नेऊन अंधार्या कोठडीत ठेवले. [अहमदनगरचा किल्ला राजबंद्यांच्या हालअपेष्टेसाठी नाना फडणसाच्या वेळेपासून तो आजदीनतागयत नाठाळ ठरलेला आहे.] चोवीस तास गोविंदरावाला अंधार्या कोठडीत ठेवायचे. पोलिशी समजावणीसाठी थोडा वेळ बाहेर आणायचे, तेवढाच त्याला सूर्यप्रकाश दिसायचा.
गोविंदरावाचा कबुली जबाब मिळाला नाही, तर गुप्त कमिशनच्या उपद्व्यापाचा भंबाळा वाजणार, म्हणून हरप्रयत्न करून तो मिळविण्याच्या सूचना मुंबईहून ओवान्सला सारख्या येत असत. हे काम कुशलतेने उरकण्यासाठी ओयान्सने सखाराम बल्लाळ महाजनी (गोविंदरावचा चुलता) हे पात्र हाताशी धरून अहमदनगरला ठेवले होते. हा सखाराम मयत विठ्ठलपंत महाजनी दिवाण याचा भाऊ. आप्पासाहेब भोसल्याच्या पक्षाला चिकटल्यामुळे, सहाजीकच तो नातूकंपूत सामील झाला. आप्पासाहेब भोसले गादीवर येताच आपल्याला आपल्या मयत भावाची दिवाणगिरी मिळेल, या तुपाच्या आशेने नातूकटाची खरकटी चाटायला सखाराम तयार झाला होता. अहमदनगरचा कलेक्टर हट्ट आणि सखाराम दररोज कबुली जबाबासाठी गोविंदरावांची ‘पोलिशी’ समजूत घालीत होते.
पण ‘दीर्घ सूचनावाला’ नातू याने गोविंदरावाला अटक झाली तेव्हाच एक कारस्थान रचून ठेवले होते. कृष्णाजी सदाशिव भिडे नावाचा त्याच्या हाताखाली काम केलेला एक पेनशनर गृहस्थ होता. लक्ष्मणपंत शेकदारातर्फे त्याला १२५० रुपये रोख बक्षिस देण्याच्या कराराने बांधून, त्याच्या हाताने, गोविंदरावाची आई गिरजाबाई हिच्या नावाचा एक कबुली जबाब लिहून घेतला नि तो गवर्नरकडे पूर्वीच पाठऊन दिला होता. ओवान्स सातार्याला निघाला तेव्हा सर ग्रांटाने तो कागद त्याला देऊन, कमिशनचा पुरावा पक्का करायची सूचना दिली. हा कागद कृष्णाजी भिड्याने सातार्यास सखाराम महाजनीच्या घरातच बसून लिहिला पण पाठविला मात्र पंढरपुराहून थेट गवर्नरकडे. त्यात महाराजांच्या सगळ्या फितुरी कामात गोविंदराव होता, त्याने फितुरी पत्रे लिहिली, अशी गिरीजाबाईची कबुली होती आणि तिचा भाऊ विष्णू केशव देवस्थळी याची (खोटी सही करून) साक्ष घातली होती.
अर्जावरची तारीख मात्र गोविंदरावाला पुण्याला नेला त्या वेळेला जुळती अशी घातली होती. कारण, गिरजाबाई ही गोविंदरावाला भेटायला पुण्याला गेली होती आणि तेथे तिने त्याच्या संमतीनेच या अर्जात `सत्याला स्मरून, अक्कलहुशारीने` फितुरीचा उलगडा केला. असे सिद्ध करायचे होते. सातार्यास येतांच ओवान्सने या महत्त्वाच्या अर्जाची चौकशी करण्यासाठी कृष्णाजी सदाशिव भिड्याला समोर आणण्याचा नातूला हुकूम केला. लिहिणावळीबद्दल भिड्याला ठरलेल्या १२५० रुपयांपैकी फक्त १५० रुपये देऊन पावती घेतली आणि बाकीचे रुपये नातू किबे जोशी कंपूने आपसात वाटून घेतले होते. बाकीसाठी भिडे नातूला वरचेवर भेटायचा. तो काहीतरी थापा देऊन त्याला गप्प बसवायचा. अशा अवस्थेत ओवान्सने त्याला बोलाविले, चौकशी करताच त्याने खरे मजकूर स्पष्ट सांगितला. मुख्य साक्षीदारच उलटल्यावर ओवान्सची पंचाईत झाली. तेव्हा त्याला लाचलुचपत धाकदपटशा देऊन, बाजूला बसायला सांगतले.
अर्जदार मुख्य गिरजाबाई तरी वळते की काय, हे पहाण्यासाठी ओवान्सने तिला भेटीला आणण्याचा बाळाजीपंत किण्याला हुकूम सोडला. आता तर सारेच भांडवल फुटायची वेळ आली. आपल्या नावाने बनावट अर्ज मुंबई सरकारकडे गेल्याची गिरजाबाईला नि देवस्थळीला स्वप्नातही काही कल्पना नव्हती. पण खोटे शिक्के खरे म्हणून लेल्याची रद्दी खरडी ओवान्सच्या पदरीं बेधड़क बांधून त्याला बनविणारे नातू, किबे, जोशी नि महादजी गंगाधर पटवर्धन काय अशा पेचप्रसंगाला जुमानतात! भाऊ लेल्याच्या बनावट कागदांच्या भानगडीत वावरणारी सातारची एक भिकी सोनारीण वेश्या होती. तिलाच त्यानी पैसे चारून गिरजाबाई बनवून ओवान्सपुढे उभी केली आणि अर्जाच्या अस्सलपणाबद्दल साहेब बहादुरांची खात्री पटवली. खात्री का न पटावी? या [तोतया] गिरजाबाईने गोव्याच्या पोर्च्युगीजानी गोविंदरावाला बक्षिस दिलेली एक गोव्याची तलवार, घरातला पुरावा म्हणून खुदाबंद ओवान्सच्या चरणांवर वाहिली.
तिकडे गोविंदरावचा अहमदनगरला अखंड छळ चालू होताच, जीव जाईल तर बरे, इतका तो त्रासला होता. सखाराम काका तर हात धुवून रात्रंदिवस त्याच्या कोठडीच्या दरवाजावरच यमासारखा बसलेला. अखेर एका दिवशी हट्ट कलेक्टराने लिहून आणलेल्या कागदावर गोविंदरावाची बळजबरीने सही घेण्यात आली आणि सखाराम नि हट्ट साहेबाने सर ग्रांटाची शाबासकी मिळवली.
भिडे नातूवर उलटला
कृष्णाजी भिडे पुढे पिसाळला आणि त्याने नातू नि ओवान्स यांची सगळी कुलांगडी नि लफडी बाहेर काढणारा अर्ज गवर्नराकडे पाठविला. पण नातूचा पल्ला ठेपीचा! तेथे त्याची काय दाद लागणार? भिडे अर्जावर अर्ज करीत होता. नातूला नवलाख शिव्या देत होता. ओवान्सला चोर दरवडेखोर ठरवित होता आणि ‘तुमच्या खोडसाळ अर्जाचा विचार करता येत नाही.` असे मुंबईहून त्याला जबाब जात होते. नंतर त्याने या अर्जाच्या नकला रंगो बापूजीकडे मुंबईला नि नंतर लंडनलाहि पाठविल्या. त्या त्याने पार्लमेण्टरी पुस्तकांत छापल्या. भिडे याच्या या उलाढालीमुळे ओवान्सने त्याला कैदेत टाकले होते.
१७ मार्च १८४८ च्या पत्रांत रंगो बापूजी म्हणतो, "कैदेत असतानाहि पार्लमेण्टकडे अर्ज पाठविता येतो. पण हे जमले नाही तर पुणे मुकामी वार्डीण याजपासी ता. १७ आगष्ट सन १८४४ रोजी मेघःश्याम भट बिन जगनाथ भट ढेकणे इनामदार पेठ शनवार, हे भिड़े ग्रास मालजामीन आहेत. भिडे याची चौकसी न करिता जबरीने कैद केले असे खास असल्यास, सदरहू भटजीनी पारलमेटास अर्जी लिहून, त्याजदर पाच अगर तीन साक्षी घालून ती अर्जी आपण (यशवंतराव चिटणिसाने) घेऊन इकडे जलद पाठवावी." कृष्णाजी भिडयाच्या या पश्चातापदग्ध अर्जासर्जीबद्दल काही मराठी इतिहास लेखक त्याच्या पदरी सत्यप्रियतेची पुण्याई बांधतात. नातूच्या यच्चावत हलकट भानगडी त्याने मुद्यापुराव्यानिशी मुंबई सरकारपुढे मांडल्या, ही गोष्ट खरी.
पण ती त्याने का केली! त्याचे लिहिणावळीचे ठरलेले १२५० रुपये त्याला मिळाले असते (म्हणजे येणे बाकी ११०० बुडाली नसती) तर भिडे भटाने हा अर्जाअर्जीचा उपद्व्याप केलाच असता कशाला? दक्षणेच्या कणकेने भटांची तोंडे तेव्हाच बंद होत असतात, हा सनातन धर्म कोणाला माहीत नाही? कृष्णाजी याची अर्जाची परवड रंगो बापूजीला नातू ओवान्सविरुद्ध इतर पुराव्यांबरोबर अस्सल पुरावा म्हणून लंडनच्या अधिकाऱ्यांच्या तोंडावर फेकायला छान उपयोगी पडली, एवढे मात्र खरे तेवढ्या पुरते कृष्णाजीपंताचे उपकार मानायला मी तयार आहे.
फत्तरी काळजाचा नातू
आपण उडविलेल्या अनेकमुखी भुतावळींची राजाला पुरी माहिती आहे नि मनातून तो आपल्यावर जळफळत असते, हे पक्के माहीत असतानाहि. बाहेरून साळसूदपणाचा आव आणून, ता. २२ मे १८३७ रोजी, नातू बेधडक प्रतापसिंहाच्या भेटीला राजवाड्यात गेला. राजाच्या आगतस्वागताचा भरगच्च हस्तिदंतीने स्वीकार केल्यावर चालू राजकारणी मतभेदांबद्दल गोविंदराव दिवाणाच्या अटकेबद्दल आणि इतर अनेक जिव्हाळ्यांच्या गोष्टीची बेटा एखाद्या संभाविताप्रमाणे चर्चा केली. महाराजहि फार जपूनच बोलत होते. शेजारी बळवंतराव चिटणीसहि होतेच. “दिवाणाला अटक करण्यात या शहाण्या रसिदंटाने काय मोक्ष साधला कोण जाणे! अगदी बेकायदेशिर काम केले ते! अहो, पण त्या गवर्नराला तरी काही अक्कल! त्याने तरी चौकशी करायची होती! न्याय अन्यायाची त्यालाहि पर्वा दिसत नाही. छे! वाईट दिवस आले! सध्या माणसाचा या रियासतीत काही आबदाब राहिलाच नाही. जहागीरदारांच्या संख्यांच्या बाबतीतसुद्धा बळवंतरावजी, आपण आपले तहनाम्याच्या शब्दांवरच जोर द्यावा. इतर विधानांचा विचारच करूं नये." वगैरे भाषणे नातूने केली. जाताना "गरिबाच्या घरी पाचवडला महाराजानी एकदा पायधूळ झाडावी. अशी प्रार्थना आहे माझी. बळवंतराव बरोबर येतीलच.ठीक, बुधवारी तयारीसाठी मी पुढे होतो. मागाहून सूचना येतांच महाराजानी अगत्य येण्याची कृपा करावी." असे बोलून फत्तरी काळजाचा नातू जरीचे उपकरणे फडकावीत निघून गेला. ६ व्या हेन्री नाटकात शेक्सपियरने रंगविलेली ब्लॉस्टरची भूमिकासूद्धा नातूपुढे फिकटच पडत नाही काय?
बळवंतराव चिटणिसाची उचलबांगडी
महाराजासमोर लेल्याने जबानी देऊन बनावट पत्रांच्या कटातल्या सर्व लोकांची माहीती दिल्यामुळे, नातूकंप अस्वस्थ झाला. शिवाय रंगो बापूजींकडे चिटणीसाची डाक रोजच्या रोज जातयेत असून, डॉ. मिलनच्या मार्फत थेट कलकत्त्यापर्यंत इकडील बातम्या जाऊ लागल्यामुळे, ओवांन्स बेचैन झाला. या सगळ्या झटपट डाकाडाकीचा सूत्रधार चिटणीस तेवढा उखडला की मग प्रतापसिंह पक्का उघडा पडेल. गोविंदराव दिवाण नि चिटणीस म्हणजे राजाचे डावे उजवे हात. तेच तोडण्याची कारवाई पुरी करण्याचा नातूने ओवन्सला सल्ला दिला आणि ता. १ आगस्ट १८३७ आषाढ वद्य ३० मंगळवारी पहाटे बळवंतराय मल्हार चिटणिसाला अटक करून रेसिडेन्सीत आणले. त्याची हकिकत खुद बळवंतरावाच्या शब्दानीच वाचा.
“सातार्यास रेसिदंट वोविन्स साहेब यानी आम्हास बाळाजीपंत किये व भालदार पाठवून कैद करून आपले बंगल्याजवळ वेगळा बंगला तेथे नेऊन ठेविले व पाहरा ठेविला फार इजा केली की एक शिष्या [खिसमतगार] व एक चाकरीचा माणूस जवळ ठेविला त्यासी बोलू नये. ती माणसे झाड्यास व आंघोळीस गेली असता त्याबराबर शिपायाने जाऊन कोणासही बोलू देऊ नये. व घरातून खाना अन्न द कपडे येतील ते उलगडून पहावे व रात्रीस दर तासास पाहाऱ्याचे वेळेस आम्ही शाबूद आहो नाही. हे तोंडावरील पांघरून उलगडून पहावे. असे करीत दोन महिने पर्यन्त सातारचे बंगल्यात ठेविले. बेवीस दिवसापर्यन्त आमची काही भेट व बोलणे विचारणे केले नाही. नंतर तेविसावे रोजी बोलावून नेले.”
ओवान्सने कंपनी सरकारच्या सामर्थ्याचा धाक घालून, छत्रपतीवरील आरोपाना अनुकूल अशी चिटणिसाची जवानी काढण्याचा खूप यत्न केला. लाचलुचपतीची लालूच दाखविली. सर्व काही केले. पण व्यर्थ. मुळातच बाजार खोटा, तेथे खर्याचे खोटे करण्याइतका चिटणीस ‘नातू’ किंवा ‘चिंतामणराव’ थोडाच होता? औवान्सच्या दमघाटीला न भीता स्पष्ट जबाब देताना, बळवंतरायाने काढलेले उदगार त्याच्या घराण्याच्या लौकिकाला साजेशोभेसेच होते. तो म्हणाला “वास्तवीक असेल ते जबाब करू, केवळ आपले फायद्यासाठी लबाड बोलून दुसर्याचे घरावर आग ठेवणे, हे कधीच व्हावयाचे नाही. आम्ही पुस्त दरपुस्त सात पिढ्यांचे नौकर मातबर आब्रूचे आहोत. केली ही चाकरी दोनी सरकारचे नजरे समोर व पूर्वी वडिलानी सेवा बहुत केली. त्याचे बक्षिस व कल्याण हल्ली बेआब होतो, हेच मिळत आहे. खावंदाकरिता होते. विलाज काय? लोभामुळे शाई दिवाले हजारो सरकारमेहरबानीकरिता उभे राहतील. आम्हास मजकूर माहित नाही. आमचा गुन्हा फंदफितुर दस्तऐवजी मुद्यानिशी आम्हावर लागू जाहल्यास, तोफेची बती आपले हाते अगर दारुचा बदरा आम्ही घेऊ."
नंतर एकदोन दिवसानी ओदान्सने पुन्हा चिटणिसाला बोलावून गेले. नातूने चिटणीसाला, एकांतात गाठून पोलीशी समजून देण्याचा यत्न केला. [परिशिष्ट पहा.] नंतर, नातूने पाच पन्नास जबानीपत्रके तयार करून, त्यांवर चिटणिसाने मुकाट्याने कबुलीजबाबाच्या सह्या कराव्या, असा पोलिस बंदोबस्त केला होता. पण चिटणीस नातूच्या बापाचे बारसे जेवलेला! त्याने आपल्याला निवांत एकटे बसण्याची सवलत मागितली, ती दिल्यावर, त्याने प्रत्येक जबानीपत्रकातल्या खोडसाळ मजकुराचा खोटेपणा सिद्ध करणारे लांबलांब शेरे भराभर मारून, त्याखाली सह्या ठोकल्या आणि ते कागदाचे पुडके ओवान्सच्या हात दिले. फितुराच्या प्रकरणांत चिटणिसाचे अंग आहेच आहे, हे सिद्ध करताना, ओवान्स १७-११-१८३७ च्या गुप्त खलित्यात मुंबईला लिहितो की, “सबंध मऱ्हाठी साम्राज्याचे धनी महाराज. त्याचे हे राज्य सबंध सलंग त्याना देण्यात येईल, अशी इंग्रेजांची वचनाची भाषा. पण अखेर थोडासा प्रांतच महाराजाना देऊन, कंपनी सरकारने वचनभंग केला, अशी चिटणिसानेच विधावणी देऊन राजाचे मन इंग्रेजी कलुषित केले. ते साम्राज्य परत मिळविण्यासाठी त्याने राजाला या निरनिराळ्या फितुराच्या फंदात गोवले. मुंबईला एजेंट ठेवण्याची नि विलायतेला वकील पाठविण्याची शक्कल चिटणिसाचीच, अशी माझी बालबाल खात्री झाली आहे.”
चिटणीस बधत नाही असे दिसतांच, ५० संगीनवाल्या हत्यारी सोजीरांच्या पहाऱ्यात त्याला पुणे येथे रवाना केले. तेथेहि त्याचे मन वळविण्यासाठी नातूने दीडदोन तास भेट घेतली. पण चिटणीस निमकहराम नि असत्यवादी होईना. पुण्याच्या तुरुंगात ता. ३ आक्टोबर १८३७ पासून तो २७ सप्टेंबर १८३९ पर्यन्त चिटणिसाला ठेवले होते. कैदेत असताना, नातूने चिटणिसाचे वाडे लुटवले, कागदपत्र जाळले आणि त्या वाड्यात आप्पासाहेब भोसल्याच्या जमखिडीकर रोजाना बिऱ्हाड करून दिले.
नागो देवरावंचा गोवा कट
भाऊ लेल्याच्या जबानीमुळे बनावट पत्रांचे बेण्ड फुटण्याचा प्रसंग आला. तरी धीर खचू न देतां, नागो देवराव वैद्य आणि महाशय बाळकोबा तात्या केळकर यानी सांवतवाडीला बसून, गोवा कटाची उभारणी केली होती तिकडील साहित्य पैदा करण्याचा नातूने ओवान्सला सल्ला दिला. पैकी, नागोबा (आयुर्वेद धन्वंतरी) पेडणे मुकामी रक्ती आंवेचा आजार होऊन मेला होता. बाळकोबा केळकर आणि मोरोपंत जोशी कुंदगोळकर यानी, उमाजी नायकावर धामणी तान करण्यासाठी पटाईत भुरट्यांच्या टोळ्या जमऊन, रत्नागिरी सांवतवाडी भागात दरोडे घालण्याचा धंदा चालविला होता. खेड तालुक्यातील पाली गावच्या जगन्नाथ दादाजी गोंधळेकर यांच्या वाड्यावर केळकर जोशीने दरोडा घातला आणि १८३६ च्या नवरात वेंगुल्यांचा सरकारी खजिना लुटला. म्हणून रत्नागिरीच्या तुरुंगात है दोन नातूभगत पडले होते.
केळकराशिवाय गोवाकटाचे कागद मिळायचे नाहीत आणि तो तर अटकेत तेव्हा, ओवान्सने कलेक्टर स्पूगर यास निकडीचा खलिता लिहिला की, "मुंबई सरकारला जरूर असलेले काही महत्त्वाचे कागद, बाळकोबा केळकर याजपाशी आहेत. ते आम्हाला ताबडतोब पाहिजेत. केळकराला माफी देऊन त्याला वाडीला जाण्याची मोकळीक देण्याविषयी सांवतवाडीकरानां लिहा आणि त्याला आमच्या कामदाराबरोबर कागद शिक्क्यांसह सातारला पाठवून द्या." ता. १२ आगष्ट १८३७ ला हा खलिता घेऊन दाजी बल्लाळ वैद्य आणि बाळाराम चपराशी वाडीला निघाले. तेथे २४ तारखेला पोहचले. नंतर रत्नागिरीला जाऊन तुरुंगात केळकराची भेट घेतली. तो म्हणाला. "मी आहे सध्या गुन्ह्यात, कागद नि शिक्के आहेत वाडीला. माझे मेहुणे नागो देवराव वारले. त्यांच्या उत्तरक्रियेला पैसे हवे होते, म्हणून ते कागद शिक्के मी एका मारवाड्याकडे ९०० रुपयाना गहाण टाकले आहेत. इथून मला सोडवा, गहाणाची रकम द्या, म्हणजे झाले," दाजी वैद्याने स्यूनरला भेटून त्याला ओवान्सचा खलिता दिला. तो केळकराला जामिनावरहि सोडायला तयार होई ना. वैद्याने सारे राजकारण त्याला सांगितले. तो म्हणाला, "केळकर मोठा डांबीस दरोडेखोर आहे. मुंबईला लिहितो नि मग हुकूम येईल तसे करतो." पत्रापत्री चालू झाली. गवर्नर ग्रांटाने केळकराला सातार्याला पाठवण्याचा स्पूनरला हुकूम सोडला.
वाडीला येताना बाळाराम चपराशाने केळकराच्या गहाणाच्या थापेचा छडा लावला आणि कागदे शिक्क्यांचा सौदा ४०० रुपयाला ठरवला. केळकराने एकंदर ३८ कागद ओवान्सला आपल्या पुडक्यातून काढून दिले. त्यात ३ पोर्च्युगीज पत्रे होती. शिवाय दोन शिक्के. ओवान्सने ४०० रुपये रोख दिले. नातू, किबे, आबा जोशी नि महादोबा पटवर्धन यानी कागद तपासून ते अस्सल असल्याबद्दल ओवान्सची खात्री पटवली. सातारकरानी गोव्याला नि गोवेकरानी सातार्याला लिहिलेली पत्रे एकाच भटाच्या कोथळीत सापडतात कशी, या मुद्याचा विचार करण्याचे त्याना कारणच पडले नाही. २५ पलटणी पोर्च्युगीजांच्या, १५ फ्रेंचांच्या शिवाय, जर्मनी, आस्ट्रिया नि रशियाच्या पलटणी घेऊन गोव्याचे गवर्नर डॉन मॅन्युएल इंग्रेजाना हिंदुस्थानातून हुसकावण्यासाठी सातार्याला येणार असा ११ कलमी तहनामा! आणि तो ठरला कोणाकोणात? तर म्हणे, महाराजाधिराज राजे शिवाजि छत्रपति मुकाम सातारा यांचे दरबारी वकील नागो देवराव आणि डॉन मॅन्युएल यांचेमध्ये! सातारी दरबारच्या शिक्क्यातला मजकूर -
“श्री राजा शिवाजि छत्रपति आधार हाति जयवति न तरवार” (शिक्क्यांचे फोटो पहा.) वा वा! सातारचे सन १८३९ साली विद्यमान असलेले ‘राजे शिवाजी छत्रपति’ आणि त्यांचा हा असला विचित्र शिक्का असलेले कागद म्हणजे प्रतापसिंहाच्या फितुरीचा केवढा हो अस्सल पुरावा? शिवाय नातू कंपूने त्याला अस्सलपणाचा ‘वेदोक्त’ आशीवाद दिलेला! ओवान्स तर क्रिस्तानंदात नाचू लागला. ओवान्सने लगेच सारे कागद नि शिक्के ‘प्रतापसिंहाच्या फितुरीचा अव्वल दर्जाचा पुरावा’ म्हणून मुंबईला रवाना केले. सर ग्रांटाने ते आपल्या जोरदार शेर्यानिशी कलकत्याला धाडले. नातू कंपूने अनेक हरामखोरीची घाणेरडी कर्मे करून स्वकियांचे गळे तर कापलेच, पण कंपनी सरकारच्या अधिकान्यांनाहि ‘बनवून’ आपल्या तुंबड्या भरल्या!
कलकत्त्याने थप्पड दिली
सर ग्रांटादि चाण्डाळ चौकडी प्रतापसिंह-द्वेषांचा गांजा ठासून तर्र झाली असली, तरी कलकत्ता पुरा शुद्धिवर होता. २ आक्टोबर १८३७ च्या खलित्यात लार्ड ऑक्लण्डचा सेक्रेटरी मॅकनाफटन मुंबईला लिहितो- "आक्षेपित फितुराचे आपण पाठविलेले कागदपत्र नि शिक्के पहातां आम्हाला तर हा सारा अक्कलशून्यतेचा फापटपसारा दिसतो. कोणीहि शहाणा त्यावर विश्वास ठेवणार नाही. असल्या क्षुद्र भानगडीत पडण्याइतका सातारचा राजा मूर्ख नाही. शिवाय, या पत्रांत नि शिक्क्यात प्रतापसिंहाचे नावही आढळत नाही. याचा अर्थ काय?" पाठोपाठ पुन्हा ता. १६ आक्टोबरला आणखी एक खलिता पाठवून मॅकनाफटन लिहितो- "मुंबई सरकारने अशा बिनबुडाच्या घाणेरड्या प्रकरणाचा पराचा कावळा करून एका राजाला बदनाम करावे, हे लॉर्ड गवर्नर जनरल नि त्यांचे कौन्सिल याना नामंजूर आहे."
क्रिस्तभगत रॉबर्ट ग्रांट गवर्नर याची या दोन थपडानी तर कंबरच खचली. त्याने ३० आकटोबरला बडेलाटाला पत्र लिहिले की "हे काम आता असेच अर्धवट टाकल्यास आमच्या सरकारची सगळीकडे नाचक्की होणार आहे." एक हिंदी राजा सिंहासनासकट जिवंत गाडला गेला तरी हरकत नाही. पण ‘‘आमची नाचक्की होईल!’’ केवढे हो या अंग्रेजांचे इभ्रत माहात्म्य!
गवर्नर दिग्मूढ झाला, तेव्हा मुंबईचे एक कौन्सिलर मि. अण्डरसन यानी या प्रकरणाचा पुरा छडा लावण्यासाठी, सारे कागद नि शिक्के धारवाडचा सुभा मि. डनलॉप याच्याकडे पाठवून, त्यात नावानिशी असलेल्या सर्व लोकांच्या प्रत्यक्ष साक्षी घेण्याचा. इतकेच नव्हे तर आणखी काही पत्र कोणाकडून मिळत असतील तर ती विकत घेऊन त्यांचा खरेखोटेपणा तपासून कळविण्याचा हुकूम सोडला. त्याने प्रथम संकेश्वरच्या शंकराचार्याला बोलावून आणले. कारण प्रतापसिंहाने गोव्याशी फितुराचे संधान बांधले ते या शंकराचार्याच्या मध्यस्थीने, असे नागो देवरायकडून नातूने सांगलीकराने नि त्याने नाटक केले होते आणि तसे मठाच्या शिक्क्याचे कागदपत्रहि तयार केले होते. बिचारा शंकराचार्य कलेक्टरचा हुकूम येताच घाबरला. अखिल हिंदूंचा धर्मगुरु! पण आज त्याला कंपनी सरकारच्या एका मामुली हापरारापुढे हात जोडून उभे राहण्याचा प्रसंग आला. डनलॉपने स्वामीना एकीकडे नेवून विचारले, “स्वामी, हातात गीतां गंगोदक घेऊन खरे असेल ते स्पष्ट सांगा. तुमच्या मार्फत सातारच्या राजाची गोव्याला पत्रे गेली आली, हे खरे आहे काय?"
स्वामी- श्रीगीतेची पोथी हातात घेऊन श्रीनारायणाचे शफतपुरसर सांगतो. हे सारे तुफान आम्हावर उभे केले आहे.
डनलॉप- तुम्ही ब्राम्हणांचे गुरु तुम्हावर तुफान उभे करण्याची सबब काय ती सांगावी.
स्वामी- पुणे वगैरे ठिकाणचे ब्राम्हणानी बळवंतराव चिटणीस सातारकर व विठलराव देवाजी बडोदेकर यांचा द्वेष करून प्रभु ज्ञातीचे धर्माकर्मात तंटा उत्पन्न करून ग्रामण्य केले. त्यात मुख्य चिंतामणराव पटवर्धन व बाळाजीपंत नातू यांच्या म्हणण्यात प्रभू ज्ञातीच कर्म बंद करावी. परंतु या उभयतांचे द्वेषाचे बोलणे, सबब आम्ही कबूल केले नाही. तेव्हा आम्हावर अशी तुफाने उभी केली, ते वेळी आम्ही लाचार होऊन संस्थानमठास इनामगांव वगैरे आहे हे जप्त होईल या भयामुळे पटवर्धन व नातूनी जे सांगितले त्याप्रमाणे कबूल करून पत्रे व यादी दिल्या. त्या गैरशिस्त असता आम्ही काही न बोलता दिल्या. असा मजकूर जाहला असता, साहेब गोवा आणि सातारचे वगैरे मजकुराची सबब विचारतात. परंतु हा तुफानाचा मजकूर आम्हास काही माहीत नाही आणि येविसी साहेबानी पुरी चौकशी करावी. मी संन्यासी गोसावी. मला या कामाची गरज काय? हे श्रीची शपथ करून सांगतो.
डनलॉप- प्रभूंचे जातीचे खटल्याचा मजकूर ऐकत आहो आणि तुम्हीहि कोणास भेऊ नये. पेशजीप्रमणे तुमचे मठाकडे गांवखेडी चालतील. तुम्ही सारे ब्राम्हणाचे गुरु असतां तुम्हास बुडविण्याबद्दल हे काम उभे केले. यैविसी आम्ही चौकशी केली व तुम्हीहि साफ सांगितले. परंतु या कामात एक दोन खोटे तरकटी माणसे आहेत. याजवर स्वामीनी भरंसा ठेऊ नये.
स्वामी- खोट्याचा सहवास आम्ही करणार नाही.
यानंतर डनलॉपने बाळकोबा केळकर, कुंदगोळकर मोरोपंत जोशी, दाजी बल्लाळ वैद्य, बाळाराम चपराशा, नारायण चितळे, रावजी कोटनीस, खोटे शिक्के करणारा नि पोर्च्युगीज पत्रे नि तहनामा लिहिणारा पेडण्याचा सखाराम कामत आणि इतर अनेक लोकांच्या करसून तपासण्या घेतल्या. पत्रे नि शिक्के बनावट आहेत, असे कामताने कबूल केले, तर काहीनी ईश्वरसाक्ष कानांवर हात ठेवले. ता. १२-२-१८३८ ला डनलॉपने आपला रिपोर्ट अण्डरसनकडे मुंबईला पाठविला. त्यात तो म्हणतो, “हे दस्तेवज मिळविण्याच्या कामी फार त्रास पडला, खर्चहि झाला नि पुष्कळ बुद्धीहि खर्च करावी लागली. तथापि हे कागद नि शिक्के खरे आहेत, असे मला वाटत नाही."
डनलॉपने पैदा केलेल्या काही कागदांवर ‘श्री राजा शाहू नरपती हर्षनिधान सदाशिव बाजीराव मुख्य प्रधान’ हा शिक्का होता. तो प्रतापसिंहाचा ठरविणे मूर्खपणाचे होते. राजाभिषेकाचे वेळी रावबाजीने शिक्का बदलेलया सबबीवर प्रतापसिंहाला त्याच्या बापाचे शाहू नावच पुढे चालविण्याची आज्ञावजा प्रार्थना केली होती, तरी प्रतापसिंहाने हे खोटे शाहू नाव कधीच कोठे वापरले नव्हते. शिवाय, हा सदाशिव बाजीराव मुख्य प्रधान कोण कोठचा? सदाशिव बाजीराव नावाचा कोणीहि आसामी भट पेशव्यांच्या घराण्यात जन्माला आला नाही नि मेलाहि नाही.
अण्डरसनने सर्व प्रकरणाचा अभ्यास करून, अखेर निर्णयाचे मिनिट लिहिले की— "साक्षीदारांच्या जबान्या एकमेळाच्या नाहीत. एकाहि कागदांत प्रतापसिंहाचे नाव नाही. शिक्का पहावा तर एक शिवाजीच्या नावाचा. सातारच्या गादीवर शिवाजी नावाचा एक राजा (प्रतपसिंहाच्या बापाचा दत्तक आजा) थोडे दिवस होता. मूळ मराठी राज्य स्थापन करणारा शिवाजी मरून १५९ वर्षे झाली. दुसरा शाहू नि मुख्य प्रधान सदाशिव बाजीराव यांचे शिक्के तर चक्क बनावट आहेत. सारांश, या कागदपत्रांवरून सातारच्या प्रतापसिंहांवर कसलाहि गुन्हा शाबीत होऊ शकत नाही, असे माझे स्पष्ट मत आहे." अण्डरसनच्या या शेर्याने गवर्नर ग्रांट तर सर्दच पडला. पण जातीवंत दृष्टाना कोणताहि पेच फार वेळ अटकाव करू शकत नाही. कसे, ते पुढे पहायचेच आहे.
प्रकरण १८ वे
क्रांतिचक्र जोराने गरगरू लागले
जोधपूरच्या कटाची उभारणी
कटबाज लोक म्हणजे खरोखरच सुताने स्वर्ग गाठणारे जादुगर म्हटले तरी चालतील. या जोधपूर कटाचा धागा नागपूरच्या मुधोजी ऊर्फ आप्पासाहेब भोसल्याशी नेऊन भिडवण्याची कादंबरी रचण्यात आली. या मुधोजी भोसल्याचा इतिहास मोठा रोमांचकारी आहे. इतिहास भास्कर पा. गो. रानडे यांच्या श्री. राजे लक्ष्मणराव भोसले चरित्रातून तो मी सारांशाने येथे देत आहे.
मुधोजी ऊर्फ आप्पासाहेब भोसले अतिशय पराक्रमी नि स्वाभिमानी होता. इंग्रजांचा तो मनस्वी द्वेष करायचा. त्याने फौजफाटा जमवून इंग्रेजांशी नागपूरला चारपाच दिवसांचे तुंबळ युद्ध करून, इंग्रजांची दाणादाण उडवून दिली. परंतु मुधोजीची चुलती बांकाबाई नाठाळ कारस्थानी होती. तिने इंग्रेजांच्या पाठिंब्याने मुधोजीच्या सैन्यात फितुर केला. खुद्द मुधोजीचा सेनापति महमदअल्लीच आंतून इंग्रेजाना सामील झाला. अर्थात सीताबरडीच्या लढाईत मुधोजीचा पराभव होऊन, इंग्रेजानी त्याला कैद केले. (सन १८१८). अलाहाबादेच्या किल्ल्यात कैद करून ठेवण्यासाठी गोरे सैन्य त्याला घेऊन जात असता, वाटेत जबलपुराजवळ तो त्यांच्या हातावर तुरी देऊन निसटला. डोंगरकपाटीच्या भागाने गुप्त वेषात चालत चालत तो जोधपुरात आला. तेथल्या महामंदिरात दहा हजार गोरखपंथी कानफाटे गोसावी साधू रहात असत. त्यांतच मुधोजी गोसावी म्हणून राहू लागला.
महामंदिर ही जोधपूरच्या राजगुरूची गादी, ती गोरख सांप्रदायी आहे. त्या वेळी जोधपूरच्या राजादीवर मानसिंहजी आणि महामंदिराच्या गादीवर राजगुरु लक्ष्मीनाथजी होते. मानसिंहजीनी या महामंदिराची एवढी इभ्रत ठेवली होती कीं तेथे कोणी एकदा नाथमहाराजांच्या आश्रयाला येऊन राहिला की त्याचे कोणतेहि अपराध असोत, ते त्याला माफ होत असत. पहिल्याने मुधोजी आपल्याबरोबर एकच मनुष्य घेऊन आपण नागपूरचा एक रजपूत म्हणून नाथजींकडे गेला. पोषाख साधूचा. लक्ष्मीनाथजीचे दर्शन घेतल्यावर त्याला तेथे आश्रय मिळाला. आप्पासाहेबाच्या आंगी दोन उत्कट गुण होते, एक चित्रकला नि दुसरा वैद्यकी. तेथे जातांच त्याने महामंदिराच्या आतल्या बाजूच्या खोल्यांत देवादिकांची चित्रे काढण्याची सुरुवात केली. आश्रमातल्या साधूलोकाना आजारीपणांत औषधोपचार चालू केले. कित्येकांचे असाध्य रोग बरे केले. पुढे राजगुरु लक्ष्मीनाथजी हेच भयंकर आजारी पडले असता आप्पासाहेबांच्या औषधाने ते बरे झाले. त्यामुळे थोड्याच दिवसांत हा (मुधोजी आप्पासाहेब) साधू आश्रमातल्या प्रत्येकजणाचा मोठा प्यारबनला इकडे, आप्पासाहेब भोसला फरारी झाला त्याला पकडून देणाराला मोठमोठी बक्षिसे आंग्रेजानी जाहीर केली आणि उम्या हिंदुस्थानात हेरांचे जाळे फैलावले. पण महामंदिरातल्या कोणालाहि आप्पासाहेबाचा चुकूनसुद्धा कधि संशय आला नाही, इतकी चोख आपल्या येषांतराची भूमिका त्याने संभाळली होती. तो खुशाल निर्भयपणाने तेथे आपला कालक्षेप करीत राहिला,
एका दिवशी महामंदिरात गुरुच्या गादीचा महोत्सव होता. त्यासाठी जोधपूर दरबारची एक नामांकीत कलावंतीण तेथे गाण्यासाठी आली. लक्ष्मीनाथजी महाराज आप्पासाहेबाना जवळ घेऊन तिचे गाणे ऐकत बसले. ती कलावंतीण अप्रतीम गाणारी नि अभिनय चतुर होती. आप्पासाहेब गाण्याचे पक्के दर्दी नि शौकी, चांगले मर्मज्ञ गाणे अगदी रंगात आले. आप्पासाहेब आपले साधूपण विसरले आणि ती नायकीण तानदारीची कमाल दाखवीत असताना, अजाणता तिला आपल्या हातातली हिर्याची अंगठी बक्षिस देऊन मोकळे झाले. तेथल्या कानफाट्या गोसाव्याना गाण्याची कदर जेवढी तेवढीच आगतीची. त्यामुळे या आंगठी प्रकरणाची मुळीच काही चर्चा न होता तो समारंभ आटोपला.
पुढे थोडयाच दिवसानी ती नायकीण मानसिंग महाराजाच्या दरबारात ती आंगठी बोटात घालून गात नाचत असता, अभिनयांचे वेळी, दिव्यांच्या प्रकाशात तिचा हिरा फार चमकू लागाला. मानसिंहाने चौकशी केली, तेव्हा पंधरा दिवसापूर्वी महामंदिरातल्या एका साधूने ती दिल्याचे तिने सांगितले. मानसिंगाने ती मागून घेतली आणि जोधपूरच्या सराफ कट्ट्यावर पाठवून हिर्याची किंमत काय म्हणून विचारले. व्यापार्याला हिऱ्याची किंमत लागेना. कारण इतका बेअयब नि पाणीदार हिरा पूर्वी कधि त्यानी पाहिलाच नव्हता. मानसिंहाने दोन तर्क बांधले. कोणातरी मोठ्या राजाची ही अंगठी चोरून आणलेली असावी, चोरीची नसेल तर तो साधूच कोणीतरी मोठा राजा असावा. मानसिंगाने स्वतः महामंदिरात जाऊन चौकशी केली.
नाथ महाराजानी आप्पासाहेबाला जवळ बोलावून म्हटले. ‘`ज्यापक्षी तुम्ही महामंदिराच्या आश्रमातले आहात, त्यापक्षी तुम्हाला पूर्ण अभय आहे. तुम्ही खरे कोण आहात हे सांगा. तुम्ही सामान्य व्यक्ती आहात, असे आम्हाला वाटत नाही.’’ तेव्हा, नाथजीच्या पायावर मस्तक ठेवून "नागपूरचे राजे आप्पासाहेब मुधोजी भोसले तो मीच." असे सांगितले. मानसिंहाने आपण राजवाड्यात येऊन राहिले पाहिजे, असा फार आग्रह केला, पण ‘मी महामंदिर सोडणार नाही.` असे स्पष्ट कळविल्यावरुन महामंदिरातच त्याची राजेशाही थाटाने रहाण्याची मानसिंहाने व्यवस्था केली.
याच दिवसांत ही बातमी अंग्रेज बहादुरांच्या कानावर गेली आणि आप्पासाहेबाला आमच्या ताब्यात द्यावा, असे त्यानी मानसिंहाला फर्मावले. ‘ते महामंदिराच्या आश्रयाला असल्यामुळे, आपल्या ताब्यात देता येणार नाही` असा त्याने जबाब दिला. आंग्रेज म्हणजे नाकावर माशी बसू द्यायचे नाहीत, तर त्याना नकार कसा सहन होणार? आप्पासाहेब आमचा कैदी आहे नि त्याला तुम्ही आमच्या ताब्यात ताबडतोब दिलाच पाहिजे`, असा धमकीवजा निर्वाणीचा खलिता मानसिंहाला आला. मानसिंहाने न डगमगतां जबाब दिला की- "महामंदिराची इभ्रत जर आपण घेऊ इच्छीत असाल, तर त्या इभ्रतीचे रक्षण करण्याकरिता नऊ लाख रजपुतांच्या समशेरी तयार आहेत. आधी ते मरतील नि मग महामंदिर नि तेथले आश्रित साधू तुमच्या ताब्यात येतील. तोवर येथल्या एकाहि आश्रिताच्या केसाला धक्का लावण्याची कोणाची शहामत नाही”. या उत्तराने आंग्रेज बसले गपचीप मनगटे घाशीत नि दातओठ खात.
नंतर बरेच वर्षांनी १५ जुलै १८४० बुधवारी आश्रमांतच आप्पासाहेबांचे देहावसान झाले. जोधपुराच्या राजेवंशाचे दहनसंस्काराचे स्थान जे ‘कागा’ तेथे राजचिन्हानी युक्त असा आप्पासाहेबाचा दहनविधि होऊन, तेथे छत्री बांधण्यात आली.
नातूकंपूची सुताने स्वर्गावर स्वारी
सन १८३० सालच्या ग्रामण्य प्रकरणात, तंजावर, म्हैसूर, कोल्हापूर, उदपूर, नागपूर वगैरे ठिकाणच्या भोसलेवंशीय नातेवाईकांत धर्माचार वैदीक पद्धतीने चालतात किंवा कसे, याची चौकशी करण्यासाठी प्रतापसिंहाची पत्रे घेऊन अनेक विद्वान ब्राम्हण पाठविण्यात आले होते. ती पत्रे नि ते ब्राम्हण रसिदंटाच्या सल्ल्याने नि त्याच्याच मार्फतीने गेलेले होते. या वेळी मुधोजी अप्पासाहेब भोसला गोसावी म्हणून जोधपूरच्या महामंदिराच्या आश्रमात राहिलेला होता नि त्याला बाहेरच्या जगाची पर्वा उरलेली नव्हती. मात्र आंग्रेज तेवढे त्याच्यावर डोळा ठेऊन बसले होते. नागपुरास अल्पवयी बाजीराव ऊर्फ रघोजी हा दत्तक होता आणि नाठाळ बांकाबाई सारा कारभार स्वतः पहात होती. मुधोजीचे नि तिचे कडवे हाडवैर म्हणजे नागपुरास मुधोजीचा कसलाह संपर्क शिल्लक राहिलेला नव्हता. वेदोकाची चौकशी करण्यासाठी उदेपुराहून आलेला शिवानंदशास्त्री याला प्रतापसिंहाने नागपूरला धाडले.
बस्स! तेवढ्या सुताच्या धाग्यावर बाळाजीपंत नातूने जोधपूरच्या तिसर्या फितुराचा केवढा मोठा स्वर्ग गाठला पहा. धर्मकारणाचे राजकारण नि राजकारणातच धर्मकारण. राजापूरच्या गंगेप्रमाणे वाटेल तेव्हा वाटेल तेथे निर्माण करण्याची राजापुरी भटांची शहामत आजही पुष्कळ पाहण्यात येते. प्रतापसिंहाचा एकहि ब्राम्हण जोधपूरला गेला नव्हता. शिवानंद फक्त नागपूरला गेला होता. पण मुधोजी भोसले नागपूरचा एवढ्याच मुद्यावर या कटाचे पाप जोधपुराला नेऊन भिडवण्याची कारवायी झाली. कट काय? तर म्हणे, उत्तर हिंदुस्थानातल्या शिंदे, होळकरादि मंडळींच्या सहायाने, मुधोजी आप्पाला मुक्त करुन, इंग्रजाना हिंदुस्थानातून हुसकावण्याचा कट केला. या धोरणाने कृष्णाजी चिंतामण आगाशे, बाबाजी महिपति पुरुषोत्तम अनंत आणि (प्रतापसिंहाचे एका वेळचे सातारा किल्ल्यावरचे जेलर) महाशय काशीपंत बंदरे, यांच्या कारकुनी कसबाने शिक्के गोर्तबाची पत्रे, याद्या नि तहनामे तयार करवून, नातूने हे जोधपूर कटाचे वांग्याचे भूत ओवान्सपुढे नाचवून, मुंबई सरकारलाहि आपल्या बुद्धिचातुर्याने थक्क केले. पलटण-फितूर नि गोवा-फितूर कारस्थाने वेळेला आंगलट आली, तर हे जोधपूर प्रकरणच असे रंगवायचे का त्याच्या रंगात पूर्वीची दोन प्रकरणे अस्सल खरी वाटलीच पाहिजेत, असा नातू कंपूने चंग बांधला होता. लेखी पुरावा भरपूर तयार होता. मुधोजी भोसल्याचे म्हणून एक ‘अस्सल’ पत्रहि जन्माला आणलेले होते. पण दोनचार जिवंत साक्षीदार मिळाले तर बहारच बहार, पैकी शिवानंदाला गाठणे बरेच धोक्याचे होते. आसेतुहिमाचल फिरलेला नि हजारो गायचे पाणी प्यायलेला आदमी तो. त्याची बनवाबनवी करावी, तर तो आपल्यालाच पाणी पाजायचा, एवढा पोच नातूला होताच. त्यानी एका गरीब यात्रेकरू गयावळावरच धाड घातली.
राघोबा गयावळाचा साडेसाती
जोधपूर कटातला महाराजाविरुद्ध अव्वल दर्जाचा जिवंत साक्षीदार म्हणून नातूकंपूने राघो गोपाळ गयावळ नावाच्या एका यात्रेकरूवरच धाड घातली. महाराष्ट्रातून काशीयात्रेला लोक जमा करून नेणारा गया येथील छोटेलाल वैद्य गयावळ यांचा हा एजंट नेहमीसारखा श्रीभागीरथीची कावड घेऊन रामेश्वरला जाण्यासाठी आणि परत येताना गयेच्या यात्रेला लोक नेण्यासाठी हा माहुलीला आला होता. माहुलीस त्याच्या बायकोचे माहेर होते. याला मोडी लिहिता वाचता येत नसे. विचारा सासुरवाडीस थोडीशी विश्रांति घेत पडला असताना माघ वद्य १० शके १७५९ ता. २४ फेब्रूवारी सन १८३८ शनिवार रोजी नातूचे ३ जासूद, ऑवान्सचे दोन पट्टेवाले, पंतप्रतिनिधीचा वकील महादजी गंगाधर उर्फ दाजीबा पटवर्धन आणि त्यांचे ४ शिपाई, अशा १० असामीनी एकदम घराला वेढा दिला आणि राघोबाची उचलबांगडी केली. त्या बिचार्याला कळेच ना का हा गहजब कशासाठी तो! त्याने पुष्कळ गयावया केली. हात जोडले. शिपायांसकट सगळ्यांच्या पायावर डोकी घासली. भर उन्हात त्याला पायी फरफटत माहुलीहून रेसिडेन्सीकडे चालविले. विसाव्याच्या मारुतीजवळ थोडी दमछाट तरी मला करू द्या, म्हणून त्याने विनवले.
पण दाजीबा पटवर्धनाने पायातल्या जोड्याला हात घालून, ‘खेटराखाली तोंड फोडीन,’ असा दम भरून, राघोबाला घामाघूम अवस्थेत तसाच पुढे रेटीत नेला आणि एकदम ओवान्सच्या पुढे उभा केला. ओवान्सच्या सल्ल्याने नातूने या राघोबाचे कसकसे धिंडवडे काढले. उपाशी कसे ठेवले, दम कसा भरला, बनावट मोडी कागदांवर गणेश विष्णु गुणे नावाच्या एका धटिंगणाकडून राघोबाचा हात धरून मोडी सह्या कशा काढून घेतल्या आणि अखेर आधीच जप्त करून बाजूला ठेऊन दिलेल्या त्याच्या कंठाळीतून फितुराच्या पुराव्याचे कांगद नातूने कसे काढून दाखविले. हा सारा प्रकार हतभागी राघोबाच्याच शब्दांत वाचकानी वाचावा. साडे अठरा महिने हकनाहक कैद भोगून सुटल्यानंतर त्याने त्या वेळचा गवर्नर जेम्स रिवेट कारन्याक याला हा अर्ज पाठविलेला आहे :-
मेहरबान गौरनर साहेब. सेवेसी अर्जी राघोबा भट निसबत छोटेलाल वैद्य गर्यावळ राहणार श्रीक्षेत्र गया प्रांत बंगाल जिल्हे बिहार अर्ज करितो ऐसाजे. आम्ही वैद्य गयावल याचे मुखत्यार गुमास्ते आहो. या देशात यात्रा न्यावयासी नेहमी येत असतो. येते वेली श्री भागीरथीची कावड घेऊन श्रीश्वेतुबंध रामेश्वरास जात असता, इलाखा सातारा येथे माइली मुकामी आमची बाइको आपले बापाचे घरी आहे, तेथे मी येऊन राहिलो. तेथून माघ य ।। ३० शके १७५९ ता. २४ फेवारी सन १८३८ रोजी बालाजीपंत नातू याचे जासूद ३ व रसिदेंट वोविन्स साहेब याचे पटेकरी २ व प्रतिनिधीचा वकील दाजीबा पटवर्धन ऊर्फ माहादाजी गंगाधर १ व त्याचे सिपाई ४ ऐसे दाह असामी येऊन आम्हास कैद करून रसिदंटापासी बारावर तीन वाजता आणिले.
तेथे पाहान्यात कैदेत ठेवून रसिदंट पुसी लागले की माहाराजाकडून तुम्हास पगार पंधा रुपये पोहचतो की काये, व महाराजानी तुम्हास कागद देऊन कोठे पाठविले होते. व फितुराबाबद मजकुर कार्य ठाऊक आहे. तो लिहून द्यावा. त्याजवरून जबाब दिल्हा की आम्ही श्रीक्षेत्र गया येथील उपाध्ये आहो. त्याबाबद माहाराजानी उपाध्येपणाचा कागद मात्र आम्हास लिहून दिल्हा. त्यासिवाय पगार आम्हास पोचत नाही व फितुराबद्दल वगैरे कागदपत्र आम्हास काहीच ठाऊक नाही. असे सांगितले असता रसिदंट साहेब बोलिले की तुम्ही च्यार ४ दिवस येथे राहावे, काही पुसावयाचे आहे. आम्ही जबाब दिल्हा जे आठ दिवस पाहिजे तर राहू, सरकारातून जे पुसणे असेल ते पुसावे.
रसिदंट साहेब याणी बालाजीपंत किये यांसीं आमच्या खाण्याचा पिण्याचा बंदोबस्त करावा म्हणोन सांगितले. परंतु आमचा ब्राम्हणधर्म, करिता कैदेत संध्याकाली दूध खाऊन उपोशीत होतो. दुसरे दिवसी रसिदंड साहेब यानी सांगितले की बालाजीपंत नातू व दाजीबा पटवर्धन सांगतील त्याप्रमाणे ऐकावे. त्याजवरून बालाजीपंत नातू व दाजीबा पटवर्धन या दोघानी आम्हास खोलीत नेऊन सांगो लागले की जयपूर जोतपुरचे राजे व सिंदे होलकर गायकवाड याजकडे फितुराबाबद माहाराजानी पत्रे दिल्ही ती आम्ही पोहचविली असे तुम्ही कबूल करून लिहून द्यावे, अगर बालासाहेब सेनापति यांचे तरी नाव लिहून द्यावे, म्हणजे रसिदंट साहेब याजकडून तुम्हास दहा हजार रुपये बक्षीस व एक गांव इनाम देवितो, यांत तुमचे कल्याण आहे. आम्ही जबाब केला की (आपण ) थोर मनुष आणि असे सरकारत खोटे लिहून देणेविसी बोलता. हे ठीक नाही. त्याजवरून बालाजीपंत नातू बोलिले की आम्ही सांगतो हे ऐकावे म्हणजे इंग्रेजी सरकार तुम्हावर मेहेरबानी ठेवितील. तूर्त कैदी मंडली आहे. त्याणी आमच्या सांगण्याप्रमाणे लिहून दिल्हे.
त्याजवर रसिदंट साहेब याची मर्जी बाहल आहे. त्याप्रमाणे तुम्हावर खुश मर्जी होईल हे तुम्ही कबूल होत नाही तर तुम्हास काल्या पाण्यावर पाठवू अगर फांसी देऊ अथवा बेडी घालून जन्मठेप देऊ, असे भय घालून लिहून भागो लागले. परंतु आम्हास मुळीच काही ठाऊक नाही, त्यापेक्षा खोटे काय लिहून द्यावे असे बोलिलो. नंतर नातू पटवर्धन यानी आम्हास रसिदंटापाशी आणिले आणि सांगितले की आम्ही सांगितल्याप्रमाणे हे लिहून देत नाही. त्याजवरून रसिदंट साहेब वोविन्स याणी आम्हास धमकी देऊन बहुत घुसा केला की तुम्ही बालाजीपंत नातू सांगतील त्याप्रमाणे लिहून देत नाही तर फासी देऊ अगर काल्या पाण्यावर पाठऊ. हे ऐकिल्यावरून आम्हास जिवाचे भय दिसोन चित बेहोष जाहले आणि मनांत विच्यार केला की रसिदंट साहेब सरकारचे कामगार, याचीहि नजर बालाजीपंत नातू सांगतील तसे लिहून द्यावे. त्यापेक्षा आता काय होणार ते होईल. असे चिंत दिलगीर जाहले. नंतर नातू व पटवर्धन याणी आपला श्वज्ञाती गणेश विष्णु गुणे, कारकून नि मंत्री. यासी आणोन रसिदंटाचे समक्ष, रुजु वोविन्स याचे समक्ष, कागद लिहविला, त्याजवर माझी सई करून मागो लागले. आम्ही जबाब केला की कागद कशाचा लिहिलात तो आम्हास ठाऊक नाही. मोडीचे अक्षर आम्हास लिहिता येत नाही. असे सांगत असता पटवर्धन व त्याजबरोबर येक दांडगा, गुण्या होता. त्याचे नांव आम्हास ठाऊक नाही, या दोघानी माझे हाती लेखणी देऊन हात धरून अक्षरे काढून घेतली. असे तेरा १३ दिवस पर्यंत दररोज बोविन्स रसिदंट साहेब व नातू व पटवर्धन हे कागद लिहून त्याजवर माझे हाते लेखणी देऊन हात धरून अक्षरे काढून घेत होते व आमची कंठाल (कंठाळी) जप्ती करून आणली. त्यांत कागदाचा रुमाल होता.
तो योविन्स रसिदंट साहेब याणी आम्हास दाखविला. परंतु त्यांत कागद कोणी काय घातले व काढून नेले, हे आम्हास कळले नाही. असा जुलूम आम्हावर कैदेत टाकून केला व सिकवीत होते त्याप्रो कबूल न जाहल्यामुळे आम्हास साडे आठरा महिने कैदे ठेविलें. रसिदंट साहेब याजपासी दाद न लागे, गौरनर साहेब सर जेम्स कारनाक सातारियास येतात. हे हिंदु रिवाजास वाकबगार व मोठे आकलवान आहेत. चांगली चौकसी करितील, असा भरवसा धरून आम्ही खूष होतो की जसा परमेश्वर तसेच गौरनरे साहेब येत आहेत. ते आमची चौकसी करून दाद करतील. परंतु कैदी लोकांची चौकशी काहीच जाहली नाही. इंग्रेजी सरकारात असा जुलूम करून लिहून मागण्याचा कायदा व दस्तुर नाही. माझी सर्वोपरी नुकसानी जाहली. मोठमोठे यजमान व राजेरजवाडे व जाहगिरदार व संस्थानी याजपासी दक्षणा मागणे व यात्रा नेणेचा उद्योग कर्णे व क्षेत्र गया येथे आमची प्राप्ती मोठी. त्याबद्दल मिलोन सुमारे साठ हजार रुपयाची लुकसानी जाहली. याजकरिता गौरनर साहेबपाती ही अर्जी केली आहे व गौरनर साहेब या देशातील रयतेची घणी मालक. तेव्हा या लुकसानीचा जाब आम्ही कोणास पुसावा, याची तजवीज होऊन हुकूम व्हावा व ही अर्जी कौसलात कौश्यल होईल, ते समई मजला समक्ष बोलावून दर्याप्ती व्हावी. म्हणजे मजवर बैनाहक वोविन्स रसिदंट याणी बालाजी नारायण नातू व दाजीबा पटवर्धन व बालाजी कासी किये याच्या सांगण्यावरून जुलूम केला, असी गौरनर साहेब व कौसलदार याची खात्री होईल. गौरनर साहेब दयावंत होऊन, चांगली दर्याप्ती करून माझा भिक्षुक ब्राम्हणाचा वच्याव होणेविसी हुकूम कर्णार खावंद मुख्त्यार आहेत. ता. २४ मार्च सन १८४०.
सही
राघोबा हा खुद.
ओव्हान्स रसिदंट हा एकपट सैतान तर त्याचे नातू किबे पटवर्धनादि शुंभ निशुंभ शंभरपट हरामखोर, अर्थात् या मानवरूपधारी सर्पाच्या लीला किती जहरी नि फरारी काळजाच्या असत, याचे प्रत्यंतर या पत्रावरून चांगलेच दिसून येते, अशी शेकडो पत्रे आहेत आणि त्यातला मनोवृत्तीचा नीचपणा कोणत्याहि विवेकी ब्राम्हणाला संताप आणल्या शिवाय रहाणार नाही, मग ब्राम्हणेतरांनी शिव्या शापांची लाखोली वाहिली, तर त्याना दोष कसा देता येईल? बिचारा राघोभटजी कारन्याक गवर्नराला परमेश्वर समजला. पण तोही नातूच्या पचनी पडलेला. सर रॉबर्ट ग्रांट नि नंतर आलेले बहुतेक गवर्नर आपापली माणुसकी नि काळिजे विलायतेला खुंटीला टांगून इकडे येत असत. शिवाय, छत्रपति नि त्याचे राज्य नावालासुद्धा शिल्लक ठेवायचे नाही, असाच जेथे ठाम निश्चय ठरलेला, तेथे रसिदंट गवर्नरादि कंपनी सरकारची यंत्रे त्या धोरणानेच फिरायची, एवढी अक्कल त्या वेळच्या हिंदी लोकाना आलेली नव्हती.
गवर्नर ग्रांटाची ‘आंतली गांठ’
नातू किंवा ब्राम्हणकंपू कितीहि दुष्ट असला तरी त्याना दरवेशी मानून स्वतः अस्वलाचा नाच करायला मुंबई सरकारचे गवर्नरादि शहाणे का तयार झाले, हा प्रश्न महत्वाचा म्हणून विचार करण्यासारखा आहे. जे का स्वार्थ परार्थ हानि करिती अशा दुर्गती पैकी नातूकंपू असला, तरी सर ग्रांट नि त्याची कौन्सिलरांची प्रभावळ तितकीच `दुर्मति` असल्याशिवाय, या भटांच्या कटबाजीच्या बाजाराला एवढी तेजी येणे शक्य नव्हते. सर ग्रांट वरून जरी मोठ्या धार्मिक सात्विकपणाचे ढोंग माजविणारा होता, तरी पिण्डाने तो अर्कट साम्राज्यवादी होता. गुप्त कमिशनच्या चौकशीवर ता. ३० जानेवारी १८३७ चा त्याचा जो शेरा मारलेला आहे. तो पाहिला म्हणजे सातारा राज्याविषयी त्याच्या भावनांची आतील गांठ तेव्हाच उघड होते. तो लिहितो, "सातारा पलटणीतल्या फितुराच्या अपराधाने राजाने तहनाम्याचा भंग करून, कंपनी सरकारच्या मैत्रीची बंधने तोडून स्पष्ट कृतघ्नपणाचे वर्तन केले आहे. अर्थात त्याला राज्यावर ठेवणे वा न ठेवणे हा आता चक्क आपल्या मेहरबानीचा प्रश्न झालेला आहे. ब्रिटिश राज्याच्या सलंग मुलुखाच्या सरळ पट्टीत, हे सातारचे राज्य म्हणजे निष्कारण अडगळ आहे आणि ती निर्माण करण्यात (पूर्वीच्या आपल्या मुत्सद्यांची) झालेली चूक सुधारण्याची हीच वेळ आहे, असे इकडच्या मुत्सद्दी मंडळात बोलले जात आहे. तशात हा सातारच्या राज्याचा प्रदेश म्हणजे दख्खनचा सर्वांत उत्तम सुपीक प्रदेश, तेव्हा आम्हीच निर्माण केलेले हे राजेशाहीचे बाहुले उचलून फेकून देण्याची आत्ताच छान संधि आलेली आहे."
तथापि गुप्त कमिशनने केलेली केवळ एकतर्फी चौकशी न्यायाच्या कसोटीला कितपत उतरेल याची शंका सर ग्रांटाच्या मनाला टोधीत असावी. कारण त्याच शेर्यात तो म्हणतो,- "मला या प्रकरणी तीन मार्ग सुचतात. (१) सर्व हक्कांसह राजाला पदच्युत करावा, (२) त्याने केलेल्या अपराधाबद्दल त्याची सणसणीत कानउघडणी करून, एकवार त्याला अपराधाची क्षमा करावी, किंवा (३) त्याच्या राज्याचा थोडासा भाग खालसा करून त्याला अदल घडवावी. (१) आणि (२) बद्दल मी सध्याच हेका धरू इच्छीत नाही. म्हणून (३) च्या मध्यम मार्गाची शिफारस करतो. शिवाय, जोधपूर येथे बंदिवान असलेल्या नागपूरच्या पदच्युत मुधोजी भोसल्याशी प्रतापसिंहाने केलेल्या कारस्थानाच्या शोधनाविषयी आम्ही आग्रा सरकारकडे विचारणा केली आहे. त्यांचा जसा रिपोर्ट येईल, तसा मी सुचविलेल्या तीन मार्गापैकी एक किंवा अनेक मार्ग हाताळण्याचा प्रश्न सोडविणे सोपे होईल."
लाडविकला का हुसकावले, ओवान्ससारख्या पाताळयंत्री प्राण्याला रेसिदंट म्हणून सातार्याला का पाठविले, गोवा कटाचे पुरावे गोळा करण्यासाठी (शक्य तर तयार करण्यासाठी) त्याला हव्या त्या सवलती का दिल्या, आणि जोधपूरच्या कटासाठीहि साहित्य “जमविण्याचा सर्वाधिकार ओवान्सला का मिळाला, या सर्व ग्रांट- करणीची आतली गांठ वर सारांशाने दिलेल्या त्याच्या शेर्यातच स्पष्ट दिसते. या त्याच्या खटपटीना महाराष्ट्रातल्या नातू सांप्रदायीक यच्चावत चित्पावनानींच कायावाचामने उचलून धरायचे ठरविल्यावर, प्रतापसिंहाला उखडून कंपनी सरकारातून ‘अर्ल ऑफ सातारा’ हा बहुमान मिळवूनच मग क्रिस्तवासी होण्याची रॉबर्ट ग्रांटने महत्वाकांक्षा बाळगली. यात तो चुकलाच कोठे?
प्रतापसिंहाने मुधोजीला आणि मुधोजीने प्रतापसिंहाला लिहिलेली बरीच बनावट पत्रे आणि गयावळ राघोबा भटांच्या कंठाळीतून, डोंबाऱ्याच्या चलचल मदारी कौशल्याने, काढलेली इतर पत्रे आणि त्याच्या घेतलेल्या अनेक जबान्यांच्या पुराव्यावर जोधपूर कटाचा आरोप सिद्ध करून, ते प्रकरण रसिदंट ओवान्सने मुंबईला रवाना केले. गुप्त कमिशनातल्या जबान्यांच्या नकला मागितल्या असताहि जशा महाराजाना दिल्या नाहीत, तसे गोवा आणि जोधपूर कटाचे पैदा केलेले पुरावे महाराजाना न दाखवताच परस्पर रसिदंट आणि गवर्नर त्या पुराव्यांच्या बाबा कलकत्याच्या गवर्नर जनरलपर्यंत फडफडवीत होते. हे पुरावे, गिरजाबाईचे बनावट पत्र, गोविंदराय दिवाणाचा जबरीने घेतलेला कबुली जबाब आणि राघो भटाकडून लिहून घेतलेली सामग्री महाराजांपुढे मांडण्याचे नैतिक धैर्य ओवान्सला काय किंवा सर ग्रांटाला काय, थोडेच होते? राजाने तडकाफडकी त्यांचा बनावटपणा सिद्ध करून सार्या कटाचा खोडसाळपणा चव्हाट्यावर फोडून कलकत्ता लंडनपर्यंत निषेधाची एकच हाकाटी केली असती. तेवढे वकिलातीचे साधन त्याने जय्यत तयार ठेवलेच होते. पण कसलीच काही दाद लागू न देता, अंधारात त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा सर ग्रांटाचा हेतू त्याच्या प्रभावळीतले काळे गोरे अधमाधम सफाईत पार पाडण्याची कसोशी करीत होते.
कारस्थान ‘राष्ट्रीय’ असावे
ठरावीक धोरणाने उठविलेल्या कारस्थानांच्या नि कटांच्या वावटळीना `राष्ट्रीय’ स्वरूप देण्यासाठी, इतर जातींपैकी नि इतर पक्षीय थोडे लोक, आपल्या संप्रदयात लटकावून ठेवण्याचा वरघाटी चळवळ्या ब्राम्हणांचा प्रघात बाळाजीपंत नातूइतका तरी खास जुना आहे. आंग्रेजांचे नि राजाचे वितुष्ट पाडणेही एक बाजू झाली. पक्की बळकट झाली. आणखी चार किंवा तीन बाजूनी जोरदार शह लावल्याशिवाय ओवान्स-नातू कंपूला सुटकाच नव्हती. एक आरोप ढासळला तर दुसरा तिसरा लगेच हाताशी तयार पाहिजे. धार्मिक बाबतीत नातूचे `धर्ममार्तण्ड अनभिषिक्त पेशवे’ चिंतामणराव सांगलीकर यांचा भिक्षुकांचा संघ, हातांत द्वेषाचे पेटलेले चुडे थेऊन प्रतापसिंहाची होळी करण्याची संधि पहात टपून बसला होता. आप्पा भोसल्याला गादीच्या आशेने फोडून, खुद राजवाड्यात यादवीची पोखरण घालण्यात आलेलीच होती. भोर, जत, अक्कलकोट इत्यादि जहागिरदारांच्या तक्रारींचा विस्तव नातूने अखंड फुलता ठेवलाच होता. शिवाय, बारीकसारीक इनामदार, मठवाले गोसावडे नि त्यांचे ऐतखाऊ शिष्यांच्याहि टोळ्या प्रतापसिंहाविरुद्ध हाकाट्या करीत महाराष्ट्रभर मोकाट सोडल्याच होत्या.
हेळगांव पाडळी हे गाव मूळचे महाराजांचे. पण ते रावबाजीने विश्वनाथ नीळकंठ कात्रे नावाच्या आपल्या एका पुजार्याला, महाराजाना न विचारतांच, इनाम देऊन टाकले होते. अडाम साहेबाच्या सरव्हे पहाणीत ही भानगड बाहेर येताच प्रतापसिंहाने ते इनाम रद्द करून गाव खालसा केले. अर्थात कात्रे भटजी महाराजांच्या निंदकांच्या पलटणीत सामील झाला.
गुमानपुरी गोसावी याच्या मठाला काही गांवे इनाम होती. दुर्व्यसने नि दुर्वर्तनानी हा इतका बहकला की लोक अखेर त्याला ठार मारायला उठले. गुमानगिरी मठ सोडून परागंदा झाला. त्याने पट्टशिष्याची निवड केलेली नव्हती. शिष्यपोळानी मठ मात्र गजबजलेला होता. जो तो गादीवर नि इनामगावांवर हक्क सांगू लागला. अखेर एक दिवस सगळ्यानी एकमेकांची डोकी फोडली. महाराजानी चौकशी केली, तेव्हा एकालाहि आपला हक्क सिद्ध करता येई ना. तेव्हा ती सगळी गांवे महाराजानी स्वराज्यात खालसा करून घेतली. झाले. सारे शिष्यपोळ महाराजांना शिव्याश्राप देत गावोगाव भटकू लागले. ऐतखाऊंची पोळी बंद झाल्यावर त्यानी बारमास होळीचा शिमगा साजरा करू नये तर काय करावे?
चाळवे तालुक्याला ओझर्डे गावचा इनामदार सरकारात ठरावीक वार्षिक रु. १८० ची नजर भरीत नसे. अनेक हुकूम त्याने धुडकावल्यावर महाराजानी ते इनाम रद्द करून खालसा केले. इनामदार रघुनाथ गोपाळ देशपांडे आणि कात्रे एकजीव एकजिव्ह होऊन प्रतापसिंहाविरुद्ध शिमगा करू लागले. इनामगावे पाहिजेत पण सरकारबाब मात्र यायची नाही, अशा वृत्तीचे गुंड इनामदार फार बोकाळले होते. पेशवाई होती तोंवर त्याना कोणी विचारीत नव्हता. ‘ब्राम्हण जगतो आहे, जगू द्या.` हे धोरण कायदेबाज प्रतापसिंहाला थोडेच मानवणार? सरकारबाब दिली नाही का इनाम जप्त करण्याचा त्याने तडाका चालू केला. त्यामुळे अनेक इनामदार त्याचे शत्रू बनले आणि नातूकंपूचे मित्र झाले.
या वेळी औन्धाचा पंतप्रतिनिधि गैरवर्तनाने जहागिरीत हवे ते उत्पात करीत होता. महाराजांच्या हे लक्षात येताच, त्यानी जहागिरीची व्यवस्था स्वताच्या कामदारांकडे दिली. प्रतिनिधीच्या व्यसनांवर चैन मारण्यास सोकावलेल्या तेथल्या दरबार्याना हा सासुरवास पत्करे ना. त्यानी प्रतिनिधीला चिथाऊन नातूच्या गळ्यात गळा घालायची शिफारस केली आणि महाराजाविरूद्ध एक फिर्याद ता. १-१२-१८३० रोजी इंग्रेजींत दाखल केली. असे अनेक तक्रारवाले नि फिर्यादवाले प्रतापसिंहाविरुद्ध उठवून, ओवान्स नातू कंपूने राजाला चारी बाजूनी पक्का शह देण्याचा बंदोबस्त केला.
ग्रांट गवर्नरची अखेरची तंगडझाड
जोधपूर कटाच्या साहित्यांत मुधोजी भोसल्याने प्रतापसिंहाला लिहिलेले एक पत्र ओवान्सला फार महत्त्वाचे वाटले. गोविंदराव दिवाणाकडून बळजबरीने सही करून घेतलेल्या जबाबाचे गोवा नि पलटणच्या फितूरकटांत मुंबई सरकारने जसे फार मोठे नाटक नाचवले, तसे मुधोजीच्या पत्रचेहि नाचवले. सर ग्रांटच्या हातीं प्रकरण येताच त्याने ता. ३१ मे १८३८ ला कलकत्याला खलिता रवाना केला. त्यात तो म्हणतो, "गोव्याचा नि जोधपूरचा कट असे दोन आरोप राजावर आहेत. यांपैकी एक किंवा दोनीहि विशेष भयंकर स्वरूपाचे आहेत असे म्हणता येणार नाही. पण माझ्या मतें राजाचा महाभयंकर गुन्हा आपल्या सैन्यातल्या शिपायाना फितूर करण्याचा प्रयत्न केल्याचा होय. ज्या गुन्ह्यासाठी बाजीरावाला पदच्युत करण्यात आले. त्याच गुन्ह्यासाठी, बाजीरावच्या शिल्लक दौलतीवर ब्रिटीश सरकारने बसवलेल्या या राजाला तेच शासन करणे अगत्याचे आहे, असे मला वाटते."
पदच्युतीची शिफारस करतानाहि सर ग्रांटाने सातारा राज्याची वासलाद- कशी लावावी याच्याहि शिफारशी केल्या. फांशीची शिक्षा झालेल्या इसमाच्या तिरडी मडक्याची त्याच्या डोळ्यादेखत तयारी करतात, त्यातलाच हा प्रकार होता. सर ग्रांट पुढे म्हणतो.- "या राजाच्या गादीवर त्याच्या भावाला बसवावे, अशी शिफारस मला करवत नाही. तहनाम्याप्रमाणे तसे काही करण्याची आपल्याला जरूरही नाही. तह प्रतापसिंहाशी झाला होता आणि त्याचे फायदे फक्त त्यालाच मिळणारे होते. ते त्याने गमावले आहेत. शिवाय, हे राज्य आपल्या ब्रिटीश मुलुखात मध्येच अडगळीसारखे असल्यामुळे, सरळ दळणवळणात नेहमीच अडथळे येतात. तेथे नेहमी तट, भांडणे नि तर्कटे सारखी चालायची. तेव्हा राजाला पदच्युत करताना, हे राज्यच खालसा करावे. राजाने कंपनी सरकारचा विश्वासघात केला, राजद्रोही वर्तन केले आणि तहनाम्याचा भंग केला म्हणून त्याला पदच्युत करून हे राज्य खालसा करण्यात येत आहे, असा जाहिरनामा काढणे आता अगत्याचे आहे."
धर्ममार्तण्ड सर ग्रांट
(टीप - याच सर रॉबर्ट ग्रांटाची आठवण अजरामर करण्यासाठी मुंबईत त्याच्या नावाने ग्रॅण्ट मेडिकल कॉलेज चाललेले आहे. स्मारकाची ही कल्पना काढणाऱ्या शहाण्याला सर ग्रांटाचे कोणते अविस्मरणीय सद्गुण आढळले, ते सांगायला तोहि आता मातीला मिसळून माती झाला असेल. या कॉलेजातला अभ्यासक्रम पुरा करणाऱ्या उमेदवाराना पूर्वी एल. एम. ॲण्ड एस. अशी पदवी देण्यात येत असे. कित्येकजण या पदवीवर विनोदाने ‘‘लायसेन्स्ड टु मर्डर ॲण्ड स्लॉटर’’ (खून नि हत्या करण्याचा परवानेवाला) अशी कोटी करीत असत आणि सर ग्रांटाची गवर्नरीची अंमदानी पहाता, त्याच्या नावाने निघालेल्या पाठशाळेतील शिष्याना मिळझारे हे लायसन वाजवी नव्हते असे कोण म्हणेल? आता ती पदवी बदलून, त्याऐवजीं एम. बी. बी.एस. पदवी चालू आहे. सर रॉबर्ट ग्रांटाचे चरित्र विचारात घेता, यापुढे मुंबईच्या या कॉलेजाला या गोऱ्या खाटकाचे नाव चालू ठेवणे, आमच्या स्वाभिमानाला नि राष्ट्रीय भावनाना कसे बदनामीकारक आहे, याचा तरुण हिंदी मेडिकल विद्यार्थ्यांनी नि जनतेनेच निर्णय घेतला पाहिजे.)
एवढेच बरळून स्वस्थ बसला नाही. त्याने पोर्च्युगीजांचा गोवा प्रांतहि खालसा करून ब्रिटीश राज्याला जोडण्याची गवर्नर जनरलला शिफारस केली. तो लिहितो, "गोव्याच्या गवर्नरने सातारच्या राजाला लिहिलेल्या एका पत्रात सुचविले आहे की ब्रिटिश सत्तेला हुसकवण्यासाठी युरपियन मदत आणायला तुम्हाला गोवा हे एकटेच मोकळे दार आहे.हे गैरसोईचे नि धोका उत्पन्न करणारे दार कायमचे बंद करून टाकण्याची ही आलेली पहिली संधि सरकारने दवडू नये, असे मला वाटते."
आकाशातल्या बापाचा लेक थडग्यात गेला
प्रतापसिंहाला पदच्युतीच्या थडग्यात जिवंत गाडलेला पाहून आयुष्याचे सार्थक पाहण्यास उतावीळ झालेला सर ग्रांट ता. ९ जुलाई १८३८ रोजी पुण्यानजीक दापोडीला मेला आणि कॅण्टोनमेण्टच्या सेण्ट मेरी चर्चच्या मसणवटीत थडग्यात शिरला. बिचार्याच्या सान्या आशा अपुर्याच राहिल्यामुळे, भूत होऊन तो दापोडीच्या भागात वावरत असतो. असे म्हणतात. त्याच्या जागी त्याचा एक कौन्सिलर मि. फेरीस, अॅकटिंग, गवर्नर म्हणून काम पाहू लागला.
दापोडीचे भूत रॉबर्ट ग्रांटाचेच
जेम्स डग्लस आपल्या बॉम्बे अॅण्ड वेस्टर्न इण्डिया ग्रंथात लिहितो की "सर बार्टल फियर (१८४७-१८४८ पर्यंत सातारचा रसिदंट, नंतर मुंबईचा गवर्नर) यानी मला प्रथम या भुताची माहिती दिली. त्यांच्या मताने ते भूत मौण्ट स्टुअर्ट एलफिन्स्टनचे असावे. मी त्यांचे हे मत खोदून काढले. ९ जुलाई १८३८ रोजी दापोडीच्या त्या बंगल्यात गेलेल्या सर रॉबर्ट ग्रांटाचेच ते भूत आहे खचित. सातारच्या त्या निरपराध नि सद्गुणी (इन्नोसण्ट अॅण्ड व्हर्च्यूअस) प्रतापसिंह राजाचा याच गळेकापू (ट्रेचरस) गवर्नरने सत्यानाश केला. दुष्ट माणसांची पिशाच्चे आपल्या मृत्यूच्याच जागी वावरत असतात, असा भूतयोनीवर विश्वास ठेवणारांचा अभिप्राय आहे. भूतांवर विश्वास ठेवणारे प्रो. आलफ्रेड रसेल वॉलेस लिहितात कीं ‘ज्या ज्या ठिकाणी माणसानी दुष्कर्मे केलेली असतात, त्याच जागांवर तीं भुते होऊन सक्तमजुरीच्या कैद्यांसारखी वावरत असतात. त्याना ती शिक्षाच असते. त्या ठिकाणी ती भुते आपल्या हयातींतील दुष्कर्माची नाटकासारखी नक्कलहि करीत असतात.’ या सिद्धांतावरून दापोडीचे भूत सर रॉबर्ट ग्रांटाचेच, याविषयी मला बिलकूल शंका नाही."
रंगो बापूजी आणि डॉ. मिलन
महाराजांकडून येतील त्या तक्रारीचे लोण लगेच मुंबई नि कलकत्ता येथे अर्जामागून अर्ज करून पोचविण्याचा डॉ. मिलन याने धूमधडाका चालवला होता. या अर्जाचे प्रकरण ‘वरून खाली’ ओवान्सकडे आले का त्यातले मुद्दे खोडता खोडता नि डॉ. मिलनच्या रोखठोक सवालाना जबाब देताना, बिचारा रडकुंडीला यायचा. अहमदनगरच्या किल्ल्यात गोविंदराव दिवाणाला अतिशय वाईट तऱ्हेने वागविण्यात येते, अशी मिलनची तक्रार येताच, गवर्नर जनरलने मुंबईच्या मार्फत तेथल्या कलेक्टरचा जाब मागवावा. अंग्रेजी कारभाराच्या पूर्वापार शिरस्त्याप्रमाणे मि. हट्ट याचे उत्तर जायचे कीं `तक्रार खोटी आहे, कैद्याला त्याच्या इतमामाप्रमाणे आणि जेलच्या नियमाप्रमाणे सर्व सोयी देण्यात येत असतात.` सेनाकर्ते दिनकरराव मोहिते याला सातार्यात गोविंदरावच्या बरोबरच अटकेत ठेवले होते. त्याच्या विषयी तक्रारीला ओवान्सचा तोच जबाब. इंग्रेजी राज्यात अर्जाअर्जीला अटकाव नाही, मात्र कोणी सरकारवर काही दोषारोप करील, तर ते केव्हाहि खरे म्हणून सरकार मान्य करणार नाही.
बनावट पत्रवाल्या कटबाजांची धरपकड
ओवान्स नातू कंपूचा परमेश्वर सर ग्रांट थडग्यात गेल्यामुळे, त्याना फार दुःख झाले. साहजीक आहे ते. राजाविरुद्ध उभारलेल्या अनेक कटांचा सूत्रधारच मातीला मिसळल्यामुळे, ते थोडा वेळ स्वस्थ बसले. इकडे १८३८ च्या आकटोबर नवंबरात महाराजानी एक छातीठोक पाऊल टाकले. रंगो बापूजीची सूचना विचारात घेऊन, भाऊ लेल्याने नावे सांगितलेल्या सगळ्या कटबाजाना पकडले नि त्यांच्या जबान्या घेऊन सोडून दिले. “कोणालाहि आम्हाला शिक्षा करायची नाही. फक्त घडला प्रकार ईश्वरसाक्ष सत्याला स्मरून लिहून द्यावा नि निघून जावे. कोणाचाहि आम्हाला सूड घ्यायचा नाही. अपराध कबूल करा नि माफीने घरोघर जा." असे आश्वासन दिल्यावरून, सर्व कटबाजानी आपापल्या कर्माचे पुराण स्वदस्तुरच्या सह्यानी लिहून महाराजांच्या हवाली केले, तेव्हा कोठे आपल्या विरुद्ध कायकाय कारस्थानांचा डोंबाळा ओवान्स नातूकंपूने पेटवलेला आहे. याची प्रतापसिंहाला स्वच्छ कल्पना आली. (या जबान्या परिशिष्टात दिलेल्या आहेत.) त्यांची एक प्रत महाराजानी रसिदंटा मार्फत मुंबई सरकारकडे ता. ४-११-१८३८ रोजी आणि रंगो बापूजीकडे ता. ४/२-१२-१९३८ रोजी पाठवून दिली. सर्व कागदपत्रांच्या इंग्रजी भाषांतराच्या नकला करून, रंगोबाने सयद मीर अफलजअल्ली याला तयार ठेवलाच होता. महाराजांची आज्ञा होताच त्याला, मक्केच्या यात्रेला जात आहे अशा सबबीवर, जहाजात बसवून लंडनला रवाना केले. मीर अफलजअल्ली लंडनला दाखल होऊन, डॉ. मिलनच्या पत्रानी तेथे ओळखी पाळखी करू लागल्यावर बर्याच दिवसानी मुंबई सरकारला समजले आणि ओवान्स, नातूला उमजले का अखेर महाराजांचा एक वकील लंडनला ठाण मांडून बसला आहे.
गांधीलमाशांचे पोळे खवळविले
१८३८ च्या आकटोबर नवंबरात रूटबाजांच्या जबान्या घेण्यापूर्वी, प्रतापसिंहाने एक निष्कारण उपद्व्याप करून ठेवला. त्याच्या सोवळ्या धार्मिक कल्पनांचा नि क्षत्रियत्त्वाच्या अट्टहासाचा परिचय पूर्वी करून दिलाच आहे. ओवन्स नाथूकंपूच्या राजकारणी फटबाजीच्या भानगडी चालल्या असताना, चिंतामणराव सांगलीकराचे भिक्षुक मंडळ स्वस्थ बसलेले नव्हते. ‘`कायस्थ प्रभू हे शूद्राधम आहेत, सोनार हे दैवज्ञ ब्राम्हण नसून शूद्रच आहेत, मराठ्याना क्षत्रियत्वाचा नि वेदोक्ताचा अधिकार नाही, तेहि शूद्रच. प्रतापसिंह छत्रपतीला ‘क्षत्रिय कुलावतंस’ मायना लावण्याचा अधिकार नाही. कारण कोणत्याही ब्राम्हणाने त्याचा किंवा त्याच्या एकाहि पूर्वजाचा वेदोक्त राजाभिषेक केलेला नाही. त्याला फार तर फार ‘भोसलेकुलावतंस’ हा मायना लावता येईल.’’ अशा चिथावण्यांच्या पोथ्या, याद्या नि जाहिरनामे चिंतामणराव सांगलीकराच्या कारखान्यातून शेकड्यानी बाहेर पडत होते आणि गावोगाव नि खेडोपाडी शेकडो तरुण भटपोळ त्यांचा फैलावा करीत होते. भटांच्या या कावाकावीला बंद पाडण्यासाठी, प्रतापसिंहाने आबा पारसनिसाकडून वेदोक्त राजाभिषेकाची पोथी तयार करून घेतली होती. त्या विधीप्रमाणे १८३८ च्या सपटंबरात त्याने स्वतःला वेदोक्त राजभिषेक करून घेतला. समारंभाचा थाटमाट वैभवशाली झाला पण त्यामुळे ब्राम्हणांच्या द्वेषाग्नीवर सावडलेली राख फुंकरली जाऊन, तो द्वेषाग्नि प्रदिप्त झाला. अर्थात राजाला ठेवण्यासाठी जी अनेक यंत्रेतंत्रे नातूकंपूने सज्ज ठेवली होत, त्यांत या अग्नीची भर पडली.
प्रकरण १९ वे.
यशवंतराव शिर्के याची लंडन यात्रा
सात समुद्र ओलांडून परदेशगमन करण्याविषयी महाराष्ट्रातल्या लोकांची समजूत अजून बरीच मागासलेली होती. रघुनाथराव दादा पेशव्याने एकदा एक `आरदाशीर फारशी’ आणि आबा काळे असे दोन वकील विलायतेला पाठविले होते. परत आल्यावर आरदाशीर आग्यारीतल्या अग्निदेवाची विभूति कपाळाला लावून पाक पावन झाला. पण आबा काळे नापाकाचा पाक होई ना. धर्ममार्तण्डांच्या सभावर सभा भरू लागल्या. विलायतचे आंग्रेजादि म्लेंच्छ सताधारी म्हणून नालदार बुटांसकट उरावर येऊन बसले, तरी धर्मग्रंथांत विलायत कोठेच आढळे ना! अखेर शहाण्या भटांनी तोडकाढली. आबा काळ्याचा पुनर्जन्म ‘केल्याशिवाय’ (झाल्याशिवाय नव्हे) केल्याशिवाय त्याची शुद्धी होत नाही. त्यासाठी एक भले मोठे सोन्याचे स्त्रीलिंग तयार केले आणि त्या नापाक आबा काळ्याला त्यातून बाहेर काढल्यावर तो पूर्ववत पाक पवित्र ब्राम्हण बनला! स्त्रीलिंगाचे सोने विधि करणार्या भिक्षुकानी एकमेकांत वाटून घेतले.
प्रतापसिंहाच्या प्रागतिक वृत्तीला ग्रांडच्या सहावासाने बरेच सुधारकी वळण लागलेले होते. विलायत प्रवासाबद्दल ता. १५-११-१८३० च्या डायरीत तो लिहितो- "राबीसन बो(ल)ले, विलायतेत जावे महाराजानी. पाच लाखात होईल. भाडे १०००००, बाकी सर्व शहरी व बादशा वगैरे ४०००००, आम्ही बो(ल)लो की, न यावे असे नाही. परंतु पैका पाहिजे व बाकी दिकत नाही, व नाही म्ह(ण)णे आवघड व गेले तरी चिंता नाही. येक धर्मास आवघड. येताना प्रायश्चित घेऊ, मुलूख पाहिलासे होऊन इंग्रज साफ़ी हा फायदा व कामे जाहाली काही तरी बरेच आहे”. सन १८३० साली विलायतला जाण्याचा प्रश्न केवळ चैनीचा, जिज्ञासुपणाचा नि हौशीचा होता. पण १८३६ साली तो निकडीचा होऊन बसला होता.
१८३८ च्या अखेरीला तर लंडनला वकील गेल्याशिवाय सुटकाच नव्हती. या कामी प्रतापसिंहाने यशवंतराव शिर्के याची प्रथमपासूनच योजना करून ठेवली होती. रंगो बापूजीने मुंबईला राहून, तेथून शिर्के याच्याशी सातारा- मुंबई - लंडनची डाक वेळच्या वेळी चालू ठेवावी, अशी योजना, निदान सन १८३६ सालात तरी ठरविलेली दिसते. पण १८३९ सालापर्यन्त शिर्के लंडनला जाऊच शकला नाही का, ते आपण याच प्रकरणात पाहू. या अवधीत आणि विशेषतः १८३९ साल उजाडताच. मि. फेरीस कामचलाऊ गवर्नर असताना, सगळ्याच धामधुमीची चक्रे बेफाम वेगाने चालू लागली. अशा प्रसंगी रंगो बापूजी सारखा धाडसी नि खटपट्या असामी मुंबईला नुसती खरडेघाशी नि टपालबाजी करीत बसेल, हे संभवते तरी कसे? मुंबईतील थोर थोर हिंदी गृहस्थ, नामदार जगन्नाथ शंकरशेट, जमशेटजी जिजीगाई यांच्यासारखे स्थानिक पुढारी आणि हिंदी लोकांशी समजुतीने नि सहानुभूतीने वागणारे निवडक इंग्रेज गृहस्थ यांच्या तो सारख्या भेटीगाठी घेऊन सातारा प्रकरणाविषयी त्यांची सहानुभूति मिळविण्यासाठी नेहमी भटकत असे. इतकेच काय, पण ग्रांट गवर्नर मेल्यावर त्याचे नातूकलंकित फेरीस विलोबीसारखे प्रतापसिंहद्रोही लोक सेक्रेटरिएटमध्ये राजाविरुद्ध काय काय कारवाया करीत असत, त्यांचा अंतर्वेध काढण्यासाठी आणि कित्येक गुप्त कागदांच्या नकला मिळविण्यासाठी रंगो बापूजीने पैशाच्या गिरमिटाने सेक्रेटरीच्या नितीनाही नाजूक भोके पाडून ठेवलेली होती. सन १८३९ च्या जानेवारीत जगन्नाथ नाना शंकरशेटच्या भेटीला तो गेला असता, अकल्पितपणे रंगोबाची नि कॅपटन कोगन या थोर इंग्रज अधिकाऱ्याची नानांच्या मध्यस्थीने दोस्ती झाली.
कोगन आणि रंगोबा
कॅपटन राबर्ट कोगन लष्करी नोकरीतून निवृत्त होण्यापूर्वी बरीच वर्षे मुंबईतच होता. तेथे त्याची अनेक स्थानिक थोरथोर देशी पुढार्याशी दोस्ती होती. मुंबई सरकारने निवडक थोर हिंदी गृहस्थांना ‘जस्टीस ऑफ ध पीस’ हुद्दा देऊन त्यांना निमसरकारी अधिकारी केले. तेव्हा न्यायदानाच्या कामी जे जेपींचे नवे न्यायालय उघडले गेले, तेथे कॅपटन कोगन याची ‘चेअरमन ऑफ द बेंच’ म्हणून योजना झाली. त्यावेळी जे. पी. गृहस्थांचा अधिकार फार मोठा असे. ‘फाशीच्या जागेजवळून एखाद्या जे. पी. ची गाडी नुसती जरी गेली, तरी फासावर चढविलेल्या आरोपीची बिनशर्त सुटका होत असे’. इतका मान जे. पी. ना असे म्हणून फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींचे नातेवाईक नाना शंकरशेट नि जमशेटजी जिजीभाई यांच्या घरी धरणी धरून बसत असत.
कॅपटन कोगनचा नि या थोरथोर जे. पी. चा न्यायालयात नित्याचा संबंध आल्यामुळे, हिंदी सच्छील, हिंदी संस्कृति आणि हिंदवी मनाचा सरदारी बाणा यांचा त्याला प्रत्यक्ष परिचय आला नि तो मोठमोठ्या हिंदी पुढाऱ्यांचा आणि प्रतापसिंहादि अनेक देशी राजांचा मोठा चहाता बनला. यानंतर कोगन लंडनला परत गेला. त्याचे अनेक क्षेत्रांतील कामगिरीचे महत्व ओळखून खास बादशाही सरकारने त्याला मसकतच्या सुलतानाच्या दरबारात महाराणी विक्टोरियाचा कमिशनर आणि सुलतानाच्या दरबारातला प्लेनीपोटेनशियरी (म्हणजे दरबारी वकील) म्हणून नेमले. तो इंग्रजी हुदा असा "हर ब्रिटानिक मॅजेस्टिस कमिशनर प्लेनीपोटेनशियरी टु द कोर्ट ऑफ हिज हायनेस द सुलतान ऑफ मसकत." मसकत हे पूर्व आरबस्थानात असून, त्याची राजधानी आरबी समुद्र नि इराणचे आखातावर ओमन येथे असे. काही सरकारी कामानिमित्त कॅपटन कोगनला झांजीबारला जायचे होते आणि पासपोर्टची व्यवस्था लागेपर्यंत त्याला मुंबईला रहाणे प्राप्त होते. या अवधीतच रंगो बापूजीची नि त्याची भेट होऊन दोस्ती जमली.
रंगो बापूजी एखाद्याला चिकटला की गिरमिटाची अवस्था. तशात डॉ. मिलन निघाला कोगनचा जुना जानीदोस्त. डॉक्टरने मुंबई सरकारच्या कारभार्याच्या दुष्ट राजकारणाची कोगनला तपशीलवार माहिती दिली आणि रंगोबाच्या खटपटीना कळकळीचा पाठिंबा देण्याविषयी त्याला आग्रहाची विनंती केली. कोगननेहि रंगोबाला अंतर देणार नाही अशी डॉ. मिलनला शपथ दिली. मुंबईला रहात असलेल्या दोनतीन प्रतिष्ठित मसकती आरबांचा नि रंगोबाचा त्याने परिचय करून दिला. रंगो बापूजी, डॉ. मिलन, कोगन आणि ते अरब गृहस्थ मुंबईभर एकाच गाडीतून फिरताना पाहून, गुप्त पोलिसांनी सरकारात बातमी दिली.
आधीच डॉ. मिलनसारख्या प्रतिष्ठित इंग्रेज पेनशनराचे प्रतापसिंहाला मिळालेले पाठबळ मुंबई सरकारच्या डोळ्यात सलतच होते. तशात आणखी हा (आता खुद्द बादशाही उच्च हुद्यावर चढलेला लष्करी पेनशनर) कॅपटन कोगन या लाल पागोटीवाल्या रंगो बापूजीने बगलेत मारला तर आपल्या दुष्कर्माची बोंबाबोंब थेट डायरेक्टर कोर्टापर्यन्त कदाचित विकटोरिया महाराणीपर्यन्तही जाण्याचा संभव फार! परळच्या गवर्मेण्ट हाऊसमध्ये गुप्त खात्याच्या वरिष्ट अधिकाऱ्यांची खलबते चालू झाली. अचानक १ मार्च १८३९ शुक्रवारी सकाळी कोगनसाहेब न्याहारी घेत असताना, पोलिशी घोडेस्वाराने त्याना एक खलिता आणून दिला. ‘सीक्रेट डिपार्टमेण्ट’, मुंबई कोट, ता. २८ फेवारी १८३९ च्या या खलित्यावर जे. पी. विलोबी, सेक्रेटरी, याची सही होती. पत्राचा सारांश असा-
"आपण या प्रांतात आल्यापासून, बॉम्बे मेडिकल बोर्डाचे माजी अध्यक्ष डॉक्टर मिलन आणि सातारच्या राजाचा एक देशी एजंट यांच्याशी दोन सरकारांत चाललेल्या काही भानगडीबद्दल, सहविचार करीत आहात, असे या सरकारच्या नजरेत आलेले आहे. सातारच्या राजाने ब्रिटीश सरकारविरुद्ध अनेक कट रचलेले आहेत. आपण बादशाही सरकारचे मोठे प्रातिनिधीक अधिकारी आहात. आपण असल्या भानगडीत लक्ष घालू नये, असे सुचविणे आम्हाला योग्य वाटते."
कॅपटन कोगनने विलोबीला डावलून खुद फेरीसच्या नावानेच ताबडतोब जबाब दिला की "माझी नि डॉ. मिलनची ओळख फार वर्षांची आहे. सातारच्या राजाचे एजंटहि मला भेटतात. पण तेवढ्यावरून मी तुम्हा परस्पर सरकारांतल्या गुप्त भानगडीत ढवळाढवळ करीत आहे. असा माझ्यावर आरोप करताना तुम्ही दहा अंक मोजणे जरूर होते. माझ्या अधिकाराची पायरी मी ओळखून आहे. पण तुमच्या पत्राची भाषा पाहिली तर तुम्ही मात्र ती ओळखली नाहीत, असे मी म्हणतो." या पत्राला नुसती पोच आली आणि कोगन झांजीबारला निघून गेला.
ता. २८ जून १८३९ रोजी तो मसकतला जाण्यासाठी परत मुंबईला आला. त्यापूर्वी यशवंतराव शिर्के याच्या लंडन प्रयाणाच्या काय काय भानगडी झाल्या त्या आपण आता पाहिल्या पाहिजेत. त्याला लंडनला रवाना केल्यावर मग आपण पुन्हा कॅपटन कोगनच्या भेटीला मुंबईला परत येऊ.
यशवंतराव राजेशिर्के
क्षत्रिय मराठा समाजात समशेरीचा पराक्रम त्रिलोकविश्रुत आहे. पण समशेरबहादरीच्या जोडीने कलमबहाद्दरी गाजविणारा मराठा बच्चा यशवंतराव शिर्क्याशिवाय दुसरा आढळत नाही. हा ‘शिरकाण’ केलेल्या विख्यात शिर्के घराण्यातला प्रतापसिंहाचा मामेभाऊ. याच्या भाऊबंदकीचे तंटेबखेडे फारच असत. या बखेड्यांच्या पायीं एका घराण्याची अनेक घराणी झाली नि ती नेहमी एकमेकांना पाण्यात पहात असत. यशवंतराव फार टापटिपीचा, सरळ पण संशयखोर मनाचा गृहस्थ दिसतो. याने लिहून ठेवलेली स्मरण वही अनेक दृष्टीनी फार महत्वाची आहे. त्याचे मोडी अक्षर वळणदार नि प्रेक्षणीय आहे.
लिहिण्याची सफाई, शोध घालण्याची पद्धति नि बारीकसारीक मजकूर मनमोकळ्या दिलाने तपशीलवार लिहून ठेवण्याची दक्षता वाखाणण्यासारखी आहे. शिर्क्याने आपल्या स्मरण वहीत भाऊबंदकीची अनेक त्रांगडी, त्यांचा पूर्वापार संबंध नि त्यांचे परिणाम मुद्देसूद तारीख मितीवार लिहून ठेवले आहेत. या भाऊबंदकीची रडकथा लिहीत असतानाच, छत्रपति प्रतापसिंहाने त्याला विलायतेला जाण्याला सांगितले. अर्थात भाऊबंदकीचे पुराण तसेच राहून, पुढे विलायत पुराण सुरू झाले. हे सुद्धा यशवंतरावाने मोठे मार्मिक नि शोधक दृष्टीने लिहून ठेवले आहे. त्यावरून त्याची टापटीप, मतें नि स्वभाव चांगली समजतात.
शिर्क्याची भाऊबंदकी म्हणजे एक मोठे भयंकर प्रकरणच. त्यात फसवाफसवी, ठोकाठोकी, मारामारी, जाळपोळ, लुटालूट, खून नि रक्तपात या सगळ्यांचा भरपूर समावेश झालेला दिसतो. याचा परिणाम यशवंतरावच्या स्वभावावर विपरीत होऊन, तो जात्या धाडसी नि उमदा असूनहि अत्यंत चिडचिडा, संशयी आणि कोणावर सहसा विश्वास ठेविनासा झाला. जिकडे तिकडे त्याला विश्वासघात दिसायचा. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करणार्या अनेक लोकांवर संशयीपणाने त्याने अनेक आरोप केले. प्रत्येक गोष्ट मी स्वतः करीन. तो अमका तमका माणूस काम करीलच कशावरून? अमकी रकम त्याला तुम्ही दिली का स्वतःच हबकली? पावती का नाही? एखादे सरकारी काम मुकाट्याने करून घेण्यासाठी दिलेल्या ‘चायपाण्या’चीहि पावती त्याला लागे. रंगो बापूजीने मुंबईस काही आरब मित्रांचा स्नेह जोडला होता आणि नित्य सहवासाने तो त्यांच्याशी आरबी भाषेतहि बोलत असे. यशवंतरावच्या समक्ष असे आरबी भाषण झाले की ‘रंगो बापूजीने या परक्या आरबाना माझ्याविषयी काय सांगितले कोण जाणे?` अशा संशयाने तो व्यग्र व्हायचा. यामुळे विलायतेला जाण्यासाठी छत्रपतीनी त्याची जून १८३६ मध्ये रवानगी केली, तरी १९ मार्च १८३९ पर्यंत त्याचा पाय मुंबईहून निघाला नाही. या मुदतीतसुद्धा त्याच्या भाऊबंदकीची लफडी अखंड चालूच होती आणि तो अनेक वेळा घरी सिंदला जायचा. तेथून सातार्याला यायचा नि मुहूर्त पाहून मुंबईला जायचा. याविषयी यशवंतरावच स्मरणवहीत काय लिहितो, ते वाचणे मनोरंजक आहे.
“नंतर सरकारानी सांगितले की तुमची व आणखी मंडळीची नेमणूक विलायतेस जाण्याची केली आहे. तर तुम्ही येथून निघोन मुंबईस कागदपत्रसुधा घेऊन जावे आणि तेथे मीर आफजल आली मुसलमान विलायतेस जावून आलाला माहीतगार आहे. त्याची भेट घेऊन तुमचे त्याचे विच्यारे पुढे विलायतेस जाण्याचा बेत ठरवावा. म्हणोन उभयंता बंधू सरकारानी सर्वत्र मंडळी जवल असता आज्ञा केली व विलायतेस पाठवावयाचे काय कारण, ते कागदपत्र तयार जाहले होते, ते दाखविले आणि जेष्टमासी व १३ शके १७५८ व सन १८३६ जून (जून महिना चूक दिसतो. तिथीप्रमाणे इंग्रजी तारीख २७ मे सन १८३६ शुक्रवार आहे.) सुक्रवार रोजी मुहूर्त पाहून निघते समई जी मंडळी निघणार ती रंगो बापूजी व हणमंतराव दलवी कोकणात विन्हेर येथे राहाणार याच्या आमच्या समक्षता केल्या. व उमयेता बंधूसरकार श्री देवीपासी येऊन उभे राहून त्या कागदाचा रुमाल श्रीचे पुढे ठेविला आणि आम्हास उचलावयास सांगितला की कोणतीहि प्रर्तणा (प्रतारणा) करू नये. श्रीस स्मरोन वागावे. म्हणोन शफती घेतल्यादाखल केले. नंतर विडे सरकारानी उभयतानी देऊन ते कागदपत्र व खर्चास सुधा मुंबईकडे रवानगी केली. व वस्त्रेहि आधले रोजीच दिल्ली होती. विलायतेस बोलणार पाठवावयाचे कारण की पेशजीचे तहनाम्याचे वहिवाटीस फरक इंग्रजी सरकारचे कामगारानी आणिला स।। त्याचा बंदोबस्त विलायतेहून करावयाचा म्हणोन."
यशवंतराव मुंबईला आल्यावर जहाज मिळण्याची वगैरे व्यवस्था लवकर लागे ना. मुंबईहून वाफेची पहिली आगबोट २० मार्च १८३० रोजी सुएजकडे जाण्याचा समारंभ झाला होता. त्यात फक्त व्यापारी माल नि सरकारी टपाल पाठविले होते. आगीने पाण्याची वाफ करून त्यावर गलबते चालविण्याच्या गोर्या लोकांच्या भुताटकीवर हिंदी प्रवाशांचा विश्वास नसे. शिवाय आताच्या पी. ॲण्ड ओ. कंपनीसारखी संस्था त्यावेळी नव्हती. कोणातरी व्यापार्याच्या मेहेरबानीने भरंसाट पैसे देऊन प्रवासापुरते जहाज किंवा जहाजातली थोडीशी जागा भाड्याने विकत घ्यावी लागत असे.
जहाजासाठी बरोबरची मंडळी ज्या खटपटी करीत त्यावर यशवंतरावचा विश्वास बसायचा नाही. कोठे थोडी चिरिमिरी दिली, का हा एकदम उस्तळायचा नि म्हणायचा ही पैशाची उधळपट्टी. सगळ्या गोष्टी सरळ नि सहज घडून याव्या, त्यात आत बाहेर उघड गुप्त काही नसावे ही त्याची मनाची ठेवण. परिस्थितीप्रमाणे आचारविचारांत बदल करायची वृत्तीच नाही. त्यामुळे रंगो बापूजी, भगवंतराव विठ्ठल चिटणीस आणि हणमंतराव दळवी वगैरे मंडळी कंटाळून गेली. प्रत्येक वेळेला संशय नि बेविश्वास. ‘मला तुझ्याबरोबर विलायतेला येण्याचे जमणार नाही, जा जाऊन सांग महाराजाना,` असे म्हणून हणमंतराव आपल्या गावी परत गेला.
शिवाय, यशवंतरावाची भाऊबंदकी कोठे स्वस्थ बसली होती? मुंबईलाहि ती त्याचा पिच्छा पुरवीतच होती. म्हणून तो विलायतेचा बेत रद्द करून अनेक वेळा मुंबईहून सिंदाला, सिंदाहून सातार्याला, तेथून पुन्हा मुहूर्त पाहून मुंबईला, अशा सारख्या येरझारा घालीत होता. इकडे पहावे तो नातूप्रकरणाला चांगला कढ येऊन ते अनेक बटाट्याना शिजवू लागले. पहिल्या धडाक्याला "गोविंदराव फडणीस दिवाण याजवर रसिदंटानी फितुराचे तुफान विलायतेस जाणारे निघाले सबब उभे करून शके १७५८ भाद्रपत व १२ रोजी बोलावून नेऊन कापात कैद करून ठेविले." सर्वत्र आणखीहि धरपकड सुरू झाल्यामुळे छत्रपतीनी "तुम्ही पुणीयास जाऊन तेथे स्वस्त राहावे" असे यशवंतरावास सांगितले "म्हणोन सातारियाहून फालगुण मासी शके १७५८ या साली निघोन पुणीयात येऊन च्यार पांच महिने राहिलो. त्यावर महाराजाकडून बोलावणे आले की जलद सातारियास येणे. त्यावरून निघोन आशाढ व ।। ११ शके १७५९ या रोजी [२८ जुलै १८३७] सातारियास पोहचलो. सातारियास पोहचताच माहाराज सरकारची भेट घेतली. तेव्हा सरकार बोलले की आमचे दुस्मानदार लोकांनी आमची व कुपणी सरकारची तेड हाकनाहक दिवसेंदिवस फार वाढविली. त्याविसी डाकटर मिलन बोलण्यात घातला. परंतु त्याच्याने काही होत नाही. व दुसरीहि पुस्कल मेहनत त्याची आमची सफाई होण्याविसी करीत आहे. परंतु इंग्रजी सरकारातून गोविंदराव धरल्यापासून आमचेकडील यादीपत्राचा जबाब काहीच येत नाही. तेणेकरून पुढे कोणते वेलेस काय होईल याचा नेम लागत नाही. यास्तव... तुम्ही विलायतेस निघोन जाण्याचे केल्यास आम्हास पुढील कामाचा भरवसा वाटेल."
पुन्हा आणाशपथा, प्रतिज्ञा सुमुहूर्त वगैरे होऊन शिर्के मुंबईला आला. रंगो बापूजी नि भगवंतराव विठ्ठल यानी खटपटी करून ‘उलमार’ De Ulma नावाच्या एका फ्रेंच कप्तानाला मथवून त्याचे `जॉर्ज कुबेर` नावाचे जहाज शिर्के भगवंतरावच्या लंडन प्रयाणासाठी ठरवून ठेवले. यशवंतराव लिहितो. "त्याची तारीख माघ अखेरीस फेब्रुवारी महिन्यात निघावयाची होती. ती आम्हास उलमार याणे सांगितली. तेव्हा इकडे आमचाहि सरंजाम वगैरे तयारी बहुतेक आटपली होती व दुभाशी जवळ पाहिजे म्हणोन पेशजी महाराजानी नरसिंहराव मुनसी पाठविला होता तो चांगला नहुता. म्हणोन व त्याचे गुण नीट नसोन त्याचे मनात जावयाचे नहुते. सबब परत गेला होता. त्याचे बद्दल फिरंगी करस्ताव पेट्रो लोरेस देमोत यास दरमहा करून ठेंविला.”
जहाजात ‘आक्षेपार्ह माल’ सापडला
यशवंतराव सरंजामाच्या तयारीत मग्न होण्याच्या आधी कितीतरी महिने त्याच्या लंडन प्रयाणाला बंदी करण्याचे सरकारी कारस्थान शिजत होते. २८ नवंबर १८३८ रोजीच ओवन्सने मुंबईला लिहून कळविले की मुंबईला एक डेलमूर नावाचा फ्रेंच गृहस्थ आहे. त्याच्या जहाजावरून महाराजानी लंडनला आपले वकील पाठविण्याची मसलत केलेली आहे. सबब सावधान, आंग्रेजी कारभाराच्या शिस्तीप्रमाणे अॅकटिंग गवर्नर मि. फेरीस, त्याचे सल्लागार आणि सातारा रसिदंटी मंडळ यांच्यात गुप्त लेखालेखी होवून, मुंबईत मोठ्या उत्साहाने वावरणाच्या यशवंतराव रंगोबा प्रभृति वकिलांवर नजर ठेवणारे सरकारी पाळल्ये, सावलीसारखे त्यांच्या मागावर राहिले. ८ प्रवाशांचे भाडे साडेपाचशे पौण्ड म्हणजे साडेपाच हजार रुपये डेलमूर ऊर्फ उलमार याला भरून त्याची पावती यशवंतरावने घेतलेली. आता काय, ठरल्या दिवशी आपण जहाजात बसून लंडनला जाणार, यांत शंका कसली?
अखेर तो दिवस उजाडला. यशवंतराव शिर्के, भगवंतराव विठ्ठल, चिटकोजी सुर्वे आणि त्यांचे ५ मदतनीस नोकर धक्क्यावर रंगो बापूजीचा नि डॉ. मिलनचा निरोप घेऊन होड्यांत बसले आणि जॉर्ज कुबेर जहाजात जाऊन आपले बाड विस्तर लाऊ लागले. पण जहाजाचा मालक कपतान उलमार कोठे आहे? तो येईल तेव्हा जहाज बंदरातून बाहेर पडणार. इकडे धक्क्यावर मुंबईचे कस्टम नि पोलीस अधिकारी आणि उलमार यांच्यात बाचाबाची चालू, ते त्याला बंदराबाहेर पडण्याचा दरकत (पासपोर्ट) देईनात. तुमच्या जहाजावर ‘ऑब्जेक्शनेबल गुड्ज` (आक्षेपार्ह माल) आहे, तो उतरून टाका नि मग जा कोठे जायचे ते.उलमारच्याहि डोक्यात काही उजेड पडे ना. अखेर पोलिसानी प्रवाशांची यादी त्याला दाखऊन, हे आठ हिंदू प्रवाशी सरकारचे आरोपी आहेत. त्यांची पुष्कळ चौकशी व्हायची आहे.
सबब ते आमच्या हवाली धक्क्यावर आले की तुमचा मार्ग मोकळा, असा खुलासा केला. उलमार नि पोलीस जहाजावर चढले. `तुम्ही पोलिसांची काय भानगड आहे ती मिटवा, तुमच्यासाठी आज जहाज न हाकारता आणखी पाच सहा दिवस मी थांबतो, तुम्ही सारे धक्यावर जा.` असे उलमारने यशवंतरावास सांगितले आणि त्या आठहि जणांना होड्यात बसवून परत पाठविले. आधीच यशवंतराव चिडखोर, तशात ही ऐन प्रयाणाच्या क्षणाला निघालेली भलतीच पेचदार भानगड पाहून तो भयंकर संतापला. धक्क्यावर येताच त्यांच्यामागे पोलिशी चौकशीचा ससेमिरा लागला. रोजच्यारोज आठ जणांच्या वेगवेगळा जाबजबान्या हेलपाटे नि अजअर्जी इकडे तब्बल एक आठवडा वाट पाहून उलमाराने यशवंतरावादि मंडळींचे सारे प्रवासाचे सामान धक्कयावर त्यांच्या नोकरांच्या ताब्यात देऊन तो जहाज घेऊन निघून गेला. भाड्याचे पैसे गेले पाण्यात! मुंबईच्या मॅजिस्ट्रेटाने यशवंतराव भगवंतराव नि सुर्वे यांना पोलीस कोठड्यात कैद केले. मोठमोठ्या रकमांचा जामीन घेतल्यावर मुक्त केले. सरकारी परवान्याशिवाय कोठे जाऊ नये, असा मनाईहुकूम बजावला. `सातार्याला लिहून गेले आहे. तिकडील रसिदंटाचे जसे लिहून येईल, तसा तुमच्या प्रकरणाचा मुंबई सरकार विचार करील’. एवढ्यावर त्याना मुंबईतच रिकामे लोंबकळत ठेवले (या वकिलांना कसकसा त्रास दिला, त्याचा तारीखवार तपशील, परिशिष्टांत छापलेल्या रंगो बापूजीच्या पार्लमेण्टापुढील व्याख्यानात असल्यामुळे, येथे जागा न आडवता पुढे जातो.)
या भानगडीच्या बरोबरीने यशवंतरावाच्या भाईबंदकीची खट्याळ लफडी जोरात चालू होती. यशवंतराव अझून मुंबईलाच आहे, हे समजताच त्याच्या वडिलाने सिंदास येण्याचे त्याला पत्र लिहिले. झाले. यशवंतराव पुन्हा घरी परत. ओयान्सच्या खलित्याला महाराजानी स्पष्ट दिलेला जबाब मुंबईला आल्याचे कळल्यावरून, रंगो बापूजीने यशवंतरावला मुंबईला बोलावून घेतले. त्याने सेक्रेटरी मि. बैट याची भेट घेतली. त्याने सरकारी खुलासा केला की, "तुम्हास विलायतेस जाण्यास गौरमेंटचा आटकाव नाही. परंतु गौरमेंटच्या सल्याशिवाय तुम्ही विलायतेस गेल्यास तेथे तुम्हास वकील असे म्हणणार नाहीत व जाणे तर इंग्रजी जाहज करून जावे, याप्रमाणे तुम्हास कलवावयास मजला गौरमेंटचा हुकूम जाहला."
शिवाय, हे हिंदुलोक विलायतेला गेले आणि जवळ पैका नसला तर बिचारे उपाशी मरतील, म्हणून दयाळू मुंबई सरकारने त्यांच्याकडून दर असामीला पाच हजार रुपये प्रमाणे ४० हजाराची रकम मुंबई तिजोरीत भरण्याचा हुकूम दिला. हेतू एवढाच की यांच्या खिशालाच मोठी कात्री लावली तर कंटाळून हे लंडनला जाण्याचा बेत रहीत करतील. यशवंतरावाचा चिरचिरेपणा न जुमानता, रंगो बापूजीने ही रकम तिजोरीत भरणा केली. मुंबईत मार्च महिन्यातच आलेल्या रिलायन्स नं. ४७१५ नावाच्या इंग्रेज जहाजाच्या कपतानाशी त्याने संगनमत करून, त्याला सारी हकिकत सांगितली. त्याने जहाजावर मंडळी घेण्याचे आश्वासन दिले आणि ता. १९ मार्च १८३९ रोजी सकाळी यशवंतरावादि ८ मंडळी जहाजावर चढवली. पोलिसानी पुन्हा त्रास देण्याचा यत्न केला.
त्या गोर्या इंग्रेज कपतानाने "मुंबई सरकारच्या पासपोर्टाची माझ्या जहाजाला मुळीच जरूर नाही. मी वाटेल तो माल नि वाटेल ते प्रवाशी घेऊन जाईन. तुम्हाला काय तक्रार करायची असेल ती माझ्या लंडन हापीसकडे पाठवून द्या. माझ्या गलबतावर चढाल तर गोळी झाडीन, याद ठेवा." असे सांगून तो आपले जहाज घेऊन गेला. यशवंतरावाने या आपल्या १४४ दिवसांच्या प्रवासाचे वर्णन स्मरण वहीत लिहिले आहे. त्याला ऐतिहासिक महत्त्व तर आहेच, पण विद्यमान विमानयुगात ती माहिती वाचकांना यशवंतरावाच्या शब्दांत अतिशय मनोरंजक वाटेल, म्हणून विस्ताराने येथे दिली आहे.
सन १८३९ सालचा विलायतचा प्रवास
"छ ३ माहे मोहरम इंग्रजी मुताबला तारीख १९ मार्च सन १८३९ इसवी चैत्र शु॥ ४ रोज मंगळवार शके १७६१ विकारीनाम संवत्सरे सुरू सलास सलासीन मयातैन व आलफ या रोजी प्राथकाली भोजनीतर सकालचे दहा वाजता सुमारे मुंबईहून बिराडीहून निघोन कोटातून फारबस हापेसातून नवे बोरीबंदरावर गेलो. तेव्हा पोहचवावयास बरोबर मंडळी पुस्कल आली होती. त्यातून कोणी बंदराचे किनार्यास निरोप घेऊन राहिली. कोणी जहाजापर्यंत आली. व बंदराचे किनार्यास राहिले त्याजला पुसोन बोटीत बसोन जाहजावर आकरा वाजता सुमारे जाऊन चहडलो. मुंबईहून तारीख मजकुरी इंग्रजी जाहाज रिलायंच्ये (रिलायन्स) नंबर ४७१५ यातून केपेच्या मार्गे पाण्यातून चालते जाहलो ते छ ९ मोहरम तारीख २६ मार्च चैत्र शु. ११ सोमवार रोजी आकरा वाजता मुकाम तालीकोट प्रांत मलबार या बंदरावर जाहाजवाले याणी जाहज नांगर सोडून खुंटविले. तालिकोटास आमचे सरंजामपैकी काही घेणे होते व पाणी जाहजवाले याणी भरले व पत्रे मुंबईकडे पाठविण्यास तेथील डाकेवर घातली. नंतर मंगलवारी दुसरे रोजी तेथून जाहाज चालते जाहाले. मुंबईहून निघाल्या दिवसापासून आमहास वांती लागली. तेणे करून दिवसे दिवस सुखास न वाटे व तालिकोटापासून पुढे त्याच मुलकाधी लगत कोची म्हणोन गाव आहे ते जाहाजापासून पंधरा विसा कोशावर दिसत होते. ते चैत्र २०१५ सुक्रवारपासून काहीच दिसे (नासे)...
(येथून २० ओळी मजकूर गहाळ झाला आहे.)
सोबत नसता व पुढील मागील आदेशा मनांत न आणिता महाराज सरकारावर प्रसंग फार जबरदस्त. यामुळे मागील घरचे वगैरे सर्व प्रकर्ण सोडोन देऊन, वडिलाचा वृघापकाल मनात न आणिता, प्राणावर उधार होऊन, जी गोष्ट कधी जाहली नाही ती स्वीकारून, आपला देश टाकून, मुंबईपासून विलायेत मैल सुमार १३५० येकून सात हजार कोश पाण्यातून ज्या मार्गे आलो त्या मार्गानी आहे. तिकडे एकसे चवतीस रोजानी (१४४ दिवस होतात) परमुलखी जाऊन पोहोचलो. वाटेनी जाहाजात हाल फार जाहले. हरविसी हाल जाहले. तो कचा तपसील आपले हातानी रोजनिसीचे बुकावर सुधा लिहवला नाही. आसो. वडिलाचे पुण्याई व आयुशाची बळावल व महाराज सरकारची सलाबत सबब त्यातून निभावणी होऊन कडेस लागलो. मुकाम लंडन शेहर प्रांत विलायेत इंगलीस्थान या शहरात लिवरपुलाहून पूर्व दिवसी आगीच्या गाडीतून सुक्रवारी संध्याकाळी सात वाजता निघालो ते दुसरे दिवसी २९ जमादिलावल मु० तारीख १० माहे आगष्ट श्रावण शु. १ शके १७६१ रोज शनवरी प्राःथकाळी साहा वाजता सर्वत्र मंडळी आपली माणसे सुधा व माहीतगारीस जाहाजाचा कपतान याची दोस्ती वाटेनी पडली होती सबब त्यासच घेतला होता, त्याणी आधी लंडनात आम्हास उतरावयास जागा पाहिली होती. त्या जागी सर्वत्र सुखरूप येऊन पोहोचलो.
बरोबर मंडळी
१ खुद
१ गंगु बिनी सिदोजी सालेकर
१ चिटकोजीराव सुर्वे
१ राणु बिन मालजी घोलप
१ भगवंतराव विठ्ठल (गोविंद विठ्ठल महाजनी दिवाणाचा हा भाऊ, अशी पुष्कळांची गैरसमजूत आहे. भगवंतराव हा ‘चिटणीस’ गोविंद खंडेरावचा पणतू वंशावळ - गोविंदराव - पाषाणी - विठ्ठल -भगवंत.)
१ मानाजी मोहिता
१ रावजी सिशा नि भगवंतराव
१ तुलज्यां नि भगवंतराव
१ बापु बुदगुडा
१ दुभाशी करस्ताव
येकूण मुंबईहून जहाजातून निघालेलो ते मु. मजकुरी तारीख मजकुरी पोहचलो असो.
“लंडन मुक्कामी आल्यावर तेथील लोकास जे हिंदुस्थान दक्षणेतून गोरे लोक गेलेले तेथे होते, त्यास आम्ही आल्याचे वर्तमान जाहाज लिवरपुलास पोहचताच छ्यापून आमचे नावे चहुकडे गेले. त्यावरून लंडनात वगैरेकडे सर्व हेंदू लोक इंगलिश प्रांती आल्याचे माहीत जाहले. लंडन मुक्कामी पोहोचल्यावर दक्षण हिंदुस्थानातून गोरे लोक लहान मोठे कामगार तेथे गेलेले.
त्यातून जे कोणी लंडनात होते ते येऊन भेटू लागले व मुंबई मुकामी फारबस हापेस आहे, तेथे दोस्ती हापेसवाल्याची आम्ही मुंबई मुकामी करून त्याचे यजमान लंडन मुकामी आहेत. ते फार मोठे माणूस सबब हापेसवाल्याकडून लंडनास लिहविले होते व आम्हीहि त्याचे लिहिणे घेतले. व जमसेटजी बाटलीवाले मुंबई मुकामचे याची व हापेसवाल्याचे यजमान सर च्यारलिस फारबस साहेब याची दोस्ती जाणून जमसेटजी पारती याचे पत्र सर च्यारलिस यास घेतली. त्यावरून सर च्यारलिस याणी आमचा बंदोबस्त व बातमी लिवरपुलापासून ठेवून, लंडन मुकामी प्रथमच भेटावयास येऊन, भेट घेतली आणि बिराडी माणसाची तजवीज व जाहाजातील कपतान बरोबर होता तोच आमचेजवळ ठेऊन, खाण्यापिण्यास हेंदू चालीप्रमाणे पीठ तांदळाचा व वगैरेचा बंदोबस्त करून आपले घरी गेले आणि आपले घरीहून हरएकविसी आमचा पुस्तपणा ठेऊ लागले. आमचे पुढे माहाराज सरकारातून मुंबईहून येक मुसलमान सयद मीर आफलज आली विलायतेस पाठविला होता. तो लंडन मुकामी होता. त्यास हे वर्तमान कलताच तो येऊन भेटला व तिकडील हावाल वगैरे सर्व त्याणी सांगितले.
आणि त्याजबराबर लखनोरचा नबाब आपले कामाकरिता विलायतेस गेला होता तोहि येऊन भेटला व टिपूचा लेक ज्यांबुदीन नामे आपले कामास गेला तो लंडन मुकामीच होता. त्यास आम्ही आल्याचे कलताच तोहि भेटला. आम्ही मुलखी नवेच गेलेले व हिंदुलोक कधी कोणी त्या मुलखी गेलेलाच नहुता. तेव्हा तेथील माणसे दरोबस्त आम्हास पाहण्यास फार चाहत असे. जिकडे आम्हास जाणे तिकडे जाण्यास तेथील रिवाजा प्रमाणे गाडी उंचीपैकी आणऊन त्यातून जाणे होत असे. तेव्हा रस्त्यातून जाते समयी पाहावयास मनस्वी माणसाची गर्दी हरहमेस होत होती, ती लिहिताच येत नाही. कोण्ही दोस्त मंडळी जाहलेली आपलाले घरी आम्हास नाच तमासा वगैरे पाहावयास नेत असत, ते तमाशे वगैरे जे पाहू ते फारच चमत्कारीक तसे दुसरे मुलखी कोठेच नसेल व आपल्या प्रांती तर नाहीच.
तेव्हा त्याचा तपशील काय लिहावा? इकडील डावा फार थंड. ती असी की इंग्रजी महिना माहे मे महिन्यापासून तिकडील उन्हाळ्याचे दिवस. सेतात पेरण्या होणे व माणूस सेतातून फिरणे व बागबगीचे पाहणे होत असतें, तो उन्हाळा म्हणजे फार नाही. जसे आपलेकडील थंडीचे दिवस पौष मासचे असतात त्यापेक्षा काही कमी. असे तिकडे उन्हाळ्याचे दिवस व थंडीचे दिवस नवंबरापासून येतात. ती थंडी फार मोठी पराकाष्टेचीच असती. नद्या व किरकोल बागातील वगैरे पाणी सुधा थिजून दगडी प्रमाणे होते. केवल पांढरा खडकच दिसतो. त्याजवरून माणसे हाजारो फिरत असतात. वरते जितके पाणी जमलेले तितके दगडाप्रमाणे आणि त्याचे खाली नद्यातून पाणी पुस्कल खोल असते.
लंडन हे शेहर आदमासे पाच लक्षाचे वर साहा लक्ष परयेंत घरे आहेत. ती घरे व रस्ते सडका व दुकानदारीच्या जागा व रात्रौ रोषनाई वगेरे सर्व फार चांगले. माणूस उदेगी फार. त्याच्या कळा कुशळता फारच विशेष सर्व माणूस गोरे लोक. हा विलायेत टापू आदमासे तीनसे कोस परयेंत लांबी व रुंदी आडीचशे परयेंत इतक्या भोवताले दरोबस्त पाणी. खुसकीचा रस्ता या टापूस नाही. लंडनाखेरीज आणखी या मुलकात शेहरे आहेत व खेडी तर पुस्कलच असतील. त्यातून येकंदर माणूस गोरे लोक लाहान मोठे आदमासे दोन कोट परयेंत व वरते काही, याप्रमाणे ठिकाण लागला.
विलायेत मुकामी धान्ये सातूप्रमाणे बारीक गहू व सातूहि आहेत. आणि पांढरे वाटाणे व बताटे व आणखी बारीक कार्य असते व तेल काढण्याचे येक त्यास फले बारीक येतात. याप्रमाणे धान्ये व धान्यादाखल दुसरे ऐकूण तांदूळ बाहेरून जाहाजातून येतात. तेथे पिकत नाहीत, ही सेते पिकविण्यास बैल नाहीत. घोडे आऊतास घरीत असतात. अउते इंग्रजी चालीप्रमाणे. घोड्याच्या जाती दोन तीन आहेत. चांगल्या जातीचे घोडे तिकडील आहे. त्यातून काही घोड़ी : मासलेदार चांगली आहेत. बैल ठेवितात ते गाईपुरते. गाई पुस्कल, दुधेहि त्यास पुस्कल असतात. आम्ही मुंबईहून निघालो तेव्हा दरोबस्त जीणस धान्ये वगैरे पुस्कल घेतला होता. आणि पाणीयाची पिपे लाकडी कोरी करऊन त्यात पाणी आपले माणसाकडून भरऊन जाहाजावर चढविले. नंतर ते पाणी पुरेल न पुरेल म्हणोन तालिकोट या बंदरात जहाज उभे राहिले तेव्हाहि घेतले होते. तेच पाणी नित्य जहाजात पियावयास खर्च होत होते. नंतर काही सांटि लयन (सेण्ट लायन) या बंदरात पिपे सदरहू प्रमाणे भरून घेतली.
जहाजात जागा स्वतंत्र अर्धे जहाज भाड्यानी घेतले, त्यात इंग्रजी माणूस कोणी न यावे, असा बेत ठेऊन, बोली करारातहि याप्रमाणेच होते. त्याप्रमाणे ते माणूस आमचे जागी येत नसे. त्या आपलेच जाग्यात लोखंडी चूल मांडून तिजवर तांदूल भाजून येकवेला करावयाचे. बाकी कोणास काही लागल्यास फुटाणे हरभरे खावे, या सिवाय जिनस खाण्याचे होते तेहि खाऊन दिवस घालवावा लागत असे. पुढे विलायतेस पोहोचल्यावर सयंत्र जागा घेऊन तांदूल अणऊन, गाया रस्त्यानी दुधाच्या वासरासुधा `फिरतात, त्या गाईस उभी करून, आपले माणसाकडून दुध काढऊन, आपले भांड्यात घेऊन खर्च होत होते. आणि पाणीयाची तर सोयी चांगलीच ती असी की शहरातून टेस्म (टेम्स) म्हणोन नदी फार मोठी चालली आहे. तिचे पाणी शेहराचे वरलेकडोन नळानी घेऊन नळ बांधून ती नदी सर्व शेहरात नळ घरोघर फिरविले आहेत.
शहरात जागोजाग पाण्याचे खजिने मात्र आहेत. तोहि झाकलेले. त्याचे पाणी चहूकडे त्या प्रमाणे जेथे ज्या घरात राहावे तेथे पाणी नळाचे पुस्कल. ते पाणी घरातले घरात घेऊन खर्च लागेल तितके करावे. आपला हेंदू धर्म चालण्यास नड मिळोन जाता येता पाण्यास त्या लोकाचा स्पर्शास्पर्श आणि तेथे त्याचे घर इतकेच आहे. वरकड कोठेच अडचण नाही. जसा धर्म ठेविला तसा चालतो. त्यात त्या लोकाकडून काही येक गैरशिस्त नाही. वर लिहिले यातूनहि स्पर्शास्पर्श पाण्यासुधा त्या लोकाचा होऊ न देता पराकाष्टाने जितका जसा सांभाळावयाचा तितका सांभालून राहिला. तो कचा मजकूर लिहिल्याने विस्तार फार होतो सबब न लिहिला.
‘‘या विलायतेमधली व्यापाराची व जिनसाचा जो कारखाना आहे त्याची व सभोवते जहाजाची जय हरयेकविसी घडामोडीची वगैरेची जी घालमेल आहे, ती पराकाष्ठेची आहे. बहुतेक सर्व पाहिली. त्यापैकी अमुक तऱ्हेचे आहे ते काहीच लिहत नाही. माणूस मसलतीत आकलवान व हुशार व इमानदारीस नीट याप्रमाणे वागत आहे. विलायत देशात आज ईश्वरी कृपा पूर्ण आहे. तेणे करून मनुष्याचे आयुष्याची वृद्धि व चैनात. माणूस खरे व खरे चालीने वागावयाचे. देशात पैसा द्रव जाहीर पुस्कल. त्या लोकास नित्ये आनंद शेहेर चांगले. त्यातून गाड्या रथ. त्याचे फिरणे हिंडणे त्याचे त्यास सांभिवंत आहे. दिसण्यात आले. आसो, सर्व तपसीलवार मजकूर कोठपर्यंत लिहावा. परंतु जातीवर्ण एकसारखा व एकच जात. दुजा विच्यार नाहीच. दुसरी जातच त्या लोकास माहीत नाही. सदरी जे लिहिले ते याजमुले निस्तेज्य, त्याचे आशा कृतीमुळे वाटते.”
यशवंतराव लंडनला आल्यावर त्याने सर चार्लस फोर्ब्स प्रभृति सज्जन इंग्रज गृहस्थांच्या मदतीने, बनिया कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाकडे सातारा प्रकरण मांडण्याची तजवीज चालू केली. यासाठी अनेक दुभाष्ये व भाषांतरकार नोकरीस ठेऊन, मराठी भाषेतल्या कागदपत्रांचे इंग्रजी तरजुमे करण्याचे काम चालविले. आमच्या या सोवळ्या डेप्युटेशनवाल्याना तर यासफॅसचा गंधहि नव्हता. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढत गेल्या. भाषांतर बरोबर झाले का नाही, याचा अव्वल पडताळा पहायचा कोणी? त्यात यशवंतराव म्हणजे उघडउघड सीधा आदमी. त्याची समजूत की एकदा एक मुद्देसूद पुराव्यांचे अपील डायरेक्टरांच्या बोडक्यावर आदळले का झाले. पाण्याच्या तोटीप्रमाणे चावी फिरविताच निकाल- गंगेची धार आपोआप धो धो सुरू. त्याला अंग्रेजी मनाचे आढाखेच कायदेबाजीची तेढीबाकी वळणे जाणिवेत घेण्याइतका पोच नव्हता. त्यामुळे, दुसर्या काही ज्या अन्य मार्गांनी खटपटी करायच्या, त्या न करता, तो चार दोन इंग्रजी मित्रांपलिकडे दृष्टी न फेकता बसला. नुसते तरजुम्याचे काम होलपाटीत बसला.
यशवंतरावला सध्या येथेच लंडनात ठेवून आपल्याला परत स्वदेशी गेले पाहिजे. कारण तिकडे सातार्यात एका भयंकर कारस्थानाचा सुरुंग उडवायला हातात पेटलेली बत्ती घेऊन मुंबई तयार उभी आहे.
प्रकरण २० वे
कारन्याक गवर्नरचा सैतानी धिंगाणा
ता. २४ मार्च १८३९ रविवारी सकाळी बाळाजीपंत नातू प्रतिनिधीचा कारकून दाजीबा पटवर्धन, बजाबा पराडकर आणि यशवंतराव फौजदार राजवाड्यात आले. आप्पासाहेबाशी थोडेसे भाषण करून, त्याला घेऊन बाहेर गेले. मागोमाग त्याचे काही सामान घेऊन जाताना प्रतापसिंहाला हुजरे दिसले. तपास करता समजले की आप्पासाहेब रेसिडेन्सीत रहायला गेले. दोन प्रहरीहि आप्पा परत आला नाही. तेव्हा महाराजानी बरोबर कयास केला की कटबाजांच्या घेतलेल्या जबान्यामुळे नातूकंपूची नि रसिदंटाचीहि कृष्ण कारस्थाने चव्हाट्यावर येणार, तेव्हा त्यांचा भक्कम पाठपुरावा करण्यासाठी अव्वल दर्जाचा साक्षीदार म्हणून आप्पाला वैर्यानी आपल्या कटात घेतला. आप्पाला महाराज बळजबरीने परत नेण्याचा यत्न करतील म्हणून प्रतिकार करण्यासाठी रसिदंट ओवान्सने छावणीतले लष्कर बागनेटे सरसाऊन खडे उभे ठेवले होते.
त्याच दिवशी महाराजानी रंगो बापूजीला मुंबईला पत्र पाठवून या भानगडीचा तपशील कळविला. त्यात ते लिहितात- "धाकटे चिरंजीवानी सरंजाम मागविला तर आम्ही लगेच पाठवून देऊ. ग्रांटडफ रसिदंटाने त्यांच्यासाठी जे जे ठरवून ठेवलेले आहे, तेवढे नेहमीप्रमाणे पोहचते करण्याचे आम्ही बिनदिक्कत करणारच. कापात लष्कर उभे आहे. पण तंटा वगैरे करण्याचा आमचा मानस मुळीच नाही. या प्रकरणाचा पराचा कावळा करून रसिदंट मुंबईला लिहिणारच. त्याच्या आधी तुम्ही डॉ. मिलन साहेबांकडून मुंबई, कलकत्ता नि लंडनला गेलेले आपले मित्र यांना तात्काळ पत्र पाठवून खरा मजकूर कळवाया. हे सारे काम त्या कळसूत्र्या नातूचे आहे."
ता. ९ मे १८३९ गुरुवारी सकाळी किबेये आणि यशवंतराव फौजदार वाड्यात आले. बरोबर दोन कुणबिणी होत्या. त्या आंत गेल्या. आप्पासाहेबानी धाकट्या बायकोला बोलावले आहे, असे महाराजांना समजले. घेऊन जावे, असा जबाब त्यांनी दिला. मेण्यात बसून ती आपल्या परिवारासह किबे नि फौजदारा बरोबर निघून गेली. दुसरे दिवशी प्रतापसिंहाने या घटनेबद्दल आपले विचार रंगो बापूजीला नि लंडनास शिर्के भगवंतरावला कळविले. ते पत्र परिशिष्टात पहावे.
सर जेम्स रिबेट कारन्याक
कारन्याक हा कंपनीच्या लष्करातला जुना नोकर नंतर तो पोलिटिकल खात्यात गेला. पंढरपूरला गंगाधर शास्त्र्याचा खून झाला नि रावबाजीच्या आंग्रेजांशी चकमकी चालू झाल्या, तेव्हा हा बडोद्याच्या रसिदंटाचा मदतनीस होता. या वेळचे सारे गोरे अधिकारी पक्के पैसेखाऊ लुटारू असत. एकाचाहि हात निर्मळ मिळायचा नाही. पैशासाठी हवे से उत्पात करायचे, गडगंज लूट कमवायची नि परत विलायतेला जाऊन नबाबाच्या थाटात मिरवायचे, एवढाच त्यांचा जीवनक्रम असे. कारन्याक याला अपवाद नव्हता. बडोद्यांला असताना, याने केलेले गलिच्छ धंदे नि लुबाडलेली लूट त्यावेळी ज्याच्या त्याच्या तोंडी असे.
मयत रॉबर्ट ग्रँटच्या जागेवर येण्यापूर्वी कारन्याक कंपनीच्या बोर्डाचा डायरेक्टर नि काही दिवस तर चेअरमनहि होता. २९ डिसेम्बर १८३५ रोजी, प्रतापसिंहाच्या राज्यकर्तृत्वाची अफाट स्तुति करणारे बोर्डाचे पत्र आणि रत्नजडीत तलवार आली (आणि जे पत्र नि तलवार ग्रांट खाटकाने दडवून ठेवली) त्या पत्रावर डेप्युटी चेअरमन म्हणून याच सर जेम्स रिवेट कारन्याकची सही होती. हा मुद्दा लक्ष्यात ठेवण्यासारखा आहे. जहागिरदारांच्या वादाबद्दल राजाचा हक्क मान्य करणारे आणि मुंबई सरकारला कडकडीत दोष देणारे कोर्टाचे ता. ७-२-१८३८ चे पत्र गवर्नर जनरलला पाठविले, त्यावर याच कारन्याकने चेअरमन म्हणून सही केलेली होती. मुंबई सरकारने राजाचा चालविलेला छळ लंडनच्या डायरेक्टर कोर्टाला बिलकूल पसंत नव्हता आणि जानेवारी १८३९ पर्यन्त तरी ‘राजाविरुद्ध चालविलेल्या कारवाया म्हणजे हकनाहक कालाचा अपव्यय आहे आणि त्यात ब्रिटीश सरकारच्या अब्रूला धोका आहे` असे कोर्टाने कलकत्त्याला स्पष्ट लिहिलेले होते.
`या प्रकरणाच्या चौकशा आता एकदम बंद करा.` असे इषारेहि गवर्नर जनरलमार्फत मुंबईकरांना देण्यात आलेले होते. कोर्टाने कारन्याकची मुंबईच्या गवर्नरीवर नेमणूक करताना, "राजा आणि कंपनी सरकार यांत पूर्वी होता तसा निर्मळ स्नेहभाव निर्माण करावा, झाल्या केल्या गोष्टी खोल गाडून त्यांची आठवणहि बुजवून टाकण्याची खटपट करावी आणि मुंबईला जाऊन चार्ज घेताक्षणीच राजाचा चाललेला अनेकमुखी छळ तात्काळ बंद पाडावा" असे डायरेक्टर कोर्टाने त्याला हडसून खडसून बजावले होते. पण हिंदुस्थानात पाऊल ठेवताच येथल्या कोट्यवधि जनतेवर राजे महाराजांवर नि धर्मगुरूवरहि सुलतानी नवाबी गाजविण्यास धावलेल्या या गोर्या अधिकारी गुंडेश्वराना माणुसकीचीहि दाद नसायची, तर सत्याची वचनाची नि शपथांची पर्वा कशी असणार?
कारन्याकला मुंबईची भुते झोंबली
नवा गवर्नर किंवा गवर्नर जनरल मुंबईला आला का त्याला पंचारत्या ओवाळायला खुशमस्कर्यांचा निस्वार्थसाधूंचा एक ठरावीक घोळका धक्क्यावरच गाठतो. डायरेक्टर कोर्टाने सातारा प्रकरण कायमचे विझविणाच्या कारन्याकला दिलेल्या आज्ञा अंमलात आल्या तर राजाविरुद्ध उठविलेल्या सगळ्या कट्याळांचे वांग्याचे भूत मुंबईचे गोरे कौन्सिलर, नातूकंपू आणि रसिदंट ओवान्स यांच्याच मानगुटीला बसणार नि लोकांत त्यांची तोंडे काळी होणार, हे ते जाणून होते. कारन्याकने ता. ३१ मे १८३९ शुक्रवारी गवर्नरीचा चार्ज घेताच, त्याला या काळ्या गोऱ्या कटबाजानी घेरून त्याचे कान भारले. राजाविषयी त्याचे मन विषारी हकीकतीनी जहरदार केले. कारम्याक पक्का पैसेखाऊ, राजाच्या शत्रूनी त्याची पाटलूण मोहोरानी भरून, त्याला स्वच्छ विकतच घेतला म्हणा ना. राजाची नीट समजूत घालून, पूर्ववत त्याचा स्नेह निर्माण करण्याचे कोर्टाचे निश्चित धोरण कारन्याकने ठेवले आपल्या बुटांच्या घामोळीत आणि राजाचा काटा काढण्याचा त्याने निर्धार केला. प्रतापसिंह मोठा मानी आहे. अपमानास्पद क्षमेच्या याचनेचा खर्डा सहीसाठी त्याच्यापुढे केला तर तो राज्यत्यागच पत्करील. पण अपमान लयमात्र सहन करणार नाही. त्याने राज्यत्याग केला का सुंठीशिवाय खोकला गेला, असे धोरण कारन्याकच्या सल्लागारानी त्याच्यापुढे मांडले. या धोरणाची गंगोत्री नातूच्या लाल पागोटातून निघाली, हे सांगायला नकोच.
कारन्याक-कोगन खटका
कॅपटन कोगन झांजीबारला जाण्यापूर्वी रंगो बापूजीने महाराजाना त्याच्याविषयी संपूर्ण माहिती दिली. ‘वाटेल ते करून कोगनसाहेबाला सातार्याला पाठवून देण्याची खटपट करावी` असे महाराजानी रंगोबाला लिहिले. एक तर तो झांजीबारला जाण्याच्या गडबडीत, तशात मुंबई सरकारची फेरीसची अमदानी प्रतिकूल, तेव्हा नवीन गवर्नर आल्यावर काय ते पाहू, असे कोगनने सांगून तो झांजीबारला निघून गेला. २८ जून १८३९ ला मसकतला जाण्यासाठी तो परत मुंबईला आल्यावर, ‘आपण साताऱ्याला येऊन आम्हाला भेटल्यास उपकार होतील.` अशा अर्थाचे महाराजांचे आलेले पत्र रंगोबाने कोगनला दिले. या वेळी सर जेम्स कारन्याकने गवर्नरीचा चार्ज घेतला होता. म्हणून कोगनने ता. २३ जुलै १८३९ ला कारन्याकलाच एक पत्र पाठविले आणि त्यात प्रतापसिंहाचे आलेले पत्र न उघडता, सीलबंध, त्याचबरोबर पाठवून दिले.
उद्देश एवढाच की सातारच्या राजाला प्रामाणिक सहाय करून, त्याच्या तक्रारीना न्याय मिळावा, यापलिकडे आपला कोणताहि इतर स्वार्थी भाव नाही. हे नव्या गवर्नरला कळावे. “मी पुण्यास जाणार आहे, आपण परवानगी दिली तर केवळ एक मित्र नात्याने मी राजा प्रतापसिंहाला सातार्याला जाऊन भेटू इच्छितो. यापेक्षा दोन सरकारतल्या भानगडीत मी प्रत्यक्ष काही भाग घेऊ इच्छित नाही." असे कोगनने कारन्याकला लिहिले. त्याला विलोम सेक्रेटरीने २५ जुलै चा जबाब दिला की "सातारच्या राजाला तुम्ही भेटणे या सरकारला अत्यंत अनुचित (व्हेरी अनडिझायरेबल) वाटते. तुम्ही त्याच्याशी कसलाहि संपर्क किंवा पत्रव्यवहार ठेऊ नये, अशी सूचना द्यावीशी वाटते. राजाने तुम्हाला पाठविलेला खलिता सोबत परत पाठविला आहे." कारन्याकलाहि त्याच्या मुंबईच्या परिवाराने डागळला, अशी कोगनची खात्री झाली. त्याने प्रतापसिंहाला दिलगिरीचे आणि धैर्याने संकटाना तोंड देण्यास सिद्ध रहाण्याचे पत्र पाठविलें. (२९ जुलै १८३९).
प्रतापसिंहासाठी चार गाठींचा फांस
मुंबई सरकारच्या चाण्डाळचौकटीने एक चार कलमांचा यजितपत्राचा खर्डा तयार केला. त्यातली ४ कलमे सारांशाने अशी- (१) इंग्रेज सरकारविरुद्ध महाराजानी कट केला, त्या आरोपाना बिनशर्त मान्यता द्यावी आणि १८१९ सालच्या तहनाम्यातल्या २ र्या कलमाप्रमाणे - अक्षरशः वागण्याचे लेखी वचन द्यावे. (२) आप्पासाहेब भोसले याना मिळत असलेला तनखा कायम चालू रहावा, ते जेथे रहातील तेथे त्यांची खासगी मालमत्ता त्याना पोहोचती करावी, काही तंटा पडल्यास त्याचा निकाल रसिदंट देणार नि तो महाराजाना मान्य करावा लागेल. (३) बळवंतराव चिटणीस याना मंत्रीमंडळातून कायमचे हाकलून द्यावे नि त्यांना इंग्रजी सरकारच्या परवानगीशिवाय सातारच्या राज्यात येण्याची मनाई असावी आणि (४) सोबत जोडलेल्या यादीतील असामीना आणि पुढेहि वेळोवेळी यादीत दाखल होतील त्या असामीना सन १८३६ सालापूर्वी जे तनखे होते, ते पूर्ववत चालू रहावे. त्यांच्या शरिरास किंवा मालमत्तेस महाराजाकडून यत्किचितहि तोषीस लागता कामा नये. (या यादीत सगळ्या हरामखोर कटबाजांची नावे होती). हा अटींचा खर्डा सन १८१९ च्या तहनाम्याची पुरवणी म्हणून समजण्यात यावा. असे झाले तरच इंग्रेज बहादुर कुंफणी सरकार प्रतापसिंह महाराजाना सर्व अपराधांची माफी देऊन पूर्ववत स्नेहभावाने वागविण्यास तयार होईल.
कलम (१) तर प्रतापसिंह तडाक्यासरसा लाथाडणार, हे कारन्याक कंपू जाणून होता. आप्पासाहेब भोसल्याविषयी कलम २ रे पूर्वी प्रतापसिंहाने कधि अमान्य केले नाही नि पुढे अमान्य करण्याची त्याची इच्छाहि नव्हती. बळवंतराव चिटणीसाच्या बडतर्फीचे नि कायम हद्दपारीचे कलम (३) नातूकंपूच्या आजन्म हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे नि जिव्हाळ्याचे होते. तसेच ते कंपनीच्याहि हिताचे होते.
प्रतापसिंह नि कंपनी यांत दोस्ती घडवून आणणारा आणि त्या दोस्तीच्या अटी ठरविणारा चिटणीसच. इकडे नातूकंपूच्या भटाभिक्षुकाना चिटणीसाचीच धास्ती फार मोठी. तो मोकळा होऊन महाराजांच्या पाठीशी आला तर नातूकंपूचा डाव तो तेव्हाच त्यांच्यावर उलटविल्याखेरीज रहाणार नाही आणि त्यांचे ब्राम्हण माहात्म्यहि शीरसलामत टिकणार नाही. तेव्हा प्रतापसिंहाच्या काही अटी सैल करून तो राज्यावर टिकला तरी परवडला, पण कोणत्याहि अटीवर बळवंतराव चिटणीस पुन्हा कोठेहि मोकळा रहाता कामा नये. चवथे कलम म्हणजे मान कापणार्या खाटकांचे गाईंनी पाय चाटण्यासारखे कमाल मुर्दाडपणाचे. प्रतापसिंहासारखा मानासाठी जान देणारा तत्वनिष्ठ ते मान्य करणे शक्यच नव्हते. तथापि, काही कौन्सिलराना मात्र असे वाटत होते की राज्याला मुकण्याच्या भयाने प्रतापसिंह हा खर्डा मुकाट्याने मान्य करील. जातिवंतांच्या तलख वृत्तीची दुष्टाना कल्पनाच काय असणार?
कारन्याक-प्रताप मुलाखत
प्रतापसिंहाचा सोक्षमोक्ष लावण्याच्या उद्देशाने नेक नामदार सर जेम्स रिवेट कारन्याक गवर्नरसाहेबांची स्वारी, मि. अण्डरसन (एक कौन्सिलर). मि. विलोबी सेक्रेटरी (गुप्त चौकशीचे एक स्वयंमान्य न्यायाधीश) यांसह ता. २३ जुलै १८३९ मंगळवारी पुण्याला येऊन दाखल झाली. तेथून प्रतापसिंहाला एक खलिता रसिदंट ओवान्सच्या मार्फत रवाना केला. आम्ही तिकडे येत आहोत. डाकगाडीनेच येत असल्यामुळे आणि हवाहि पावसाळी असल्याने, महाराजांनी, रिवाजाप्रमाणे सत्कारासाठी पुढे येण्याचे कारण नाही. सातार्यास दाखल होताच सूचना पाठविण्यात येईल. खलिता हाती पडताच प्रतापसिंहाने नव्या गवर्नरच्या भेटीविषयी आनंद दर्शवून भेटीची नक्की तारीख वेळ कळविण्याची विनंती जबाबात लिहून पाठविली.
ता. २२ आगष्ट १८३९ गुरुवारी संध्याकाळी गवर्नर लवाजम्यासह सातारा छावणीत येऊन दाखल झाले. दुसर्या दिवशी ओवान्सने गवर्नरच्या भेटीचे निमंत्रण राजवाड्यात जाऊन दिले. प्रतापसिंह दुपारी ३ वाजता कारन्याकला भेटला. सभोवार अण्डरसन, विलोबी आणि रसिदंट ओवान्स यांचे कोण्डाळे पडले होते. महाराज एकटेच होते. हुजर्यालाहि आत येऊ दिले नाही. त्यानीहि तशी काही विनंती केलीच नाही.
प्रास्तावीक हस्तिदंती झाल्यावर-
कारन्याक- महाराज आमच्या विरुद्ध कट रचीत आहेत. पुराव्याने हे सारे सिद्ध झालेले आहे.
महाराज- मी कसलाच नि कोणताच कट केलेला नाही, तुम्ही कमिटी नेमून खुशाल कसून चौकशी करा की.
कारन्याक- मी सगळे पाहिले आहे. आणखी चौकशीची जरूर नाही नि मला तितका वेळहि नाही. वादविवादाची काय जरूर आहे? मी काय सांगतो ते महाराजांनी ऐकावे आणि तयार केलेल्या या खर्ड्यावर मुकाट्याने सही करून मोकळे व्हावे.
महाराज- नामदाराना वेळ नसल्यास, मी सारे कागदपत्र नि दस्तऐवज कर्नल ओवान्सना दाखवतो. आमच्या विरुद्ध पुरावा कसकसा गोळा करण्यात आलेला आहे आणि तेढ कशी वाढविली आहे, याची ते चौकशी करतील. आपण फक्त न्यायाने वागा. हां, कटांत माझा संबंध असल्याचा एकतरी कागद पुरावा म्हणून सापडला तर माझे म्हणणे काही नाही.
कारन्याक- नागपूरच्या मुधोजी भोसल्याचे कटाबाबद तुम्हाला लिहिलेले पत्र आमच्यापाशी आहे.
महाराज- समजा, अण्डरसनसाहेबाना कोणी एकाद्याने पत्र लिहिले नि त्याना त्याची दखलही नाही. ज्याने पत्र लिहिले त्याच्याकडे चौकशी केली पाहिजे. अण्डरसनला विचारून काय फायदा? ते काय उत्तर देणार? याच नियमाने मी म्हणतो, त्या पत्राची मला काहीच माहिती नाही तुम्ही खुद्द भोसल्याकडे चौकशी केली पाहिजे. हे पहा नामदार इंग्रेजांच्या दोस्तीसाठी वेळ पडली तर मी विहीरीत उडी घेईन, पण जे कधि काही मी केलेच नाही, त्याचा आरोप मी केव्हाहि कबूल करणार नाही.
(कारन्याकला उत्तर देता येत नाही).
कारन्याक- मुंबईला तुम्ही एजेंट ठेऊन तहनाम्याचा भंग केला आहे.
महाराज- मी मुळीच भंग केलेला नाही. दस्तऐवजी पुराव्याने सिद्ध करून दाखवा, मी जबाब द्यायला तयार आहे.
कारन्याक- महाराजांनी मुंबईला एजेंट पाठविले.
महाराज- होय, माझ्या दरबारची प्रकरणे इंग्रजी सरकारात रुजू करण्यासाठी मी मुंबईला एजंट पाठविले. पण त्यामुळे तहनामा कसा भंग होतो?
कारन्याक- रसिदंटाला न कळविता तुम्ही हे केले.
महाराज- रसिदंट जर माझी एकहि गोष्ट मनावर घेईनासा झाला, तर इंग्रजी सरकारात से कळविणे मला जरूरच होते. इंग्रजी सरकार काय परकी सरकार आहे की काय आम्हाला? तर तहनाम्याचा भंग झाला म्हणता? शिवाय, रसिदंटाच्या मध्यस्थी शिवायहि इंग्रज सरकारकडे प्रकरणे थेट नेण्याला हरकत नाही, अशा रिवाजाची एलफिस्टन साहेबाची पत्रे आहेत.
कारन्याक- मला एलफिस्टनच्या पत्राची किंवा इतर बाराबत्तल पुराव्याची पर्वा नाही. मीफक्त तहनामा मानतो.
महाराज- तुमच्या अधिकार्याची लेखी प्रमाणे तुम्हीच जुमानीत नाही, तर मग पंचाईत म्हणायची.
कारन्याक- मी काय म्हणतो ते महाराजानी ऐकावे, नाहीतर तुमचे राज्य रहाणार नाही.
महाराज- मी कधीच राज्याची हाव धरलेली नाही. मी फक्त इंग्रजांच्या दोस्तीचा चहाता आहे. उघड चौकशीशिवाय केलेले आरोप मान्य करून राज्यावर रहाण्याची माझी मुळीच इच्छा नाही. तुम्ही मला तुरुंगात टाकलें, तर तुमच्या सण्ट्रीच्या पहार्यात भिक्षा मागून मी राहीन. अशीच तुमची मर्जी असेल तर उशीर कशाला? मी आता तुमच्या बंगल्यातच आहे आणि परत जातच नाही, म्हणजे झालं.
कारन्याक- महाराजांनी असे काही करू नये. मी सांगतो ते ऐकावे नाहीतर मलानिराळीच व्यवस्था करावी लागेल.
महाराज- काय वाटेल ती व्यवस्था करा ना. नाही कोण म्हणतो? जे गुन्हे मी केलेच नाहीत, त्यांची उघड चौकशीशिवाय मी कबुली देऊ काय? प्राणांतीहि शक्य नाही ते.
कारन्याक- तुम्ही विलायतेला काही ‘पोरं’ पाठविली आहेत. कोण विचारतो त्याना तिकडे! आणि काय हो ती तिकडे काय करणार? योग्य दिसेल ते करण्याचा मला भरपूर अधिकार आहे. सांगतो तसे करा. नाहीतर भलत्याच अडचणीत लटकून पडाल.
महाराज- मी कधी कोणाचे काही वाकडे केलेच नाही, तर मला कसली अडचण येणार? तुम्हाला काय करायचे असेल ते खुशाल करा. मी कशालाहि भीत नांही.
कारन्याक- मी तहनाम्याच्या पुरवणीचा नवीन तयार केलेला खर्डा पाठवतो. त्यावर महाराजानी सही करावी.
महाराज- सही करण्यालायक असेल तर करीन सही, नाहीतर तसे कळवीन.
ता. २४ ला ओवान्स खर्डा घेऊन राजवाड्यात गेला. महाराजानी तो वाचला आणि कपाळावर तिटकाऱ्याच्या आठ्या घालून परत केला, "मी असल्या कागदावर सही करणार नाही. जा घेऊन तो परत" महाराज म्हणाले, "ज्या गोष्टी मी केल्याच नाहीत, त्या केल्या अशी कबुली देऊन, राज्यावर रहाण्याची मला पर्वा नाही. जा जाऊन सांगा असे तुमच्या गवर्नराला."
ता. २५ ला कारन्याकने पुन्हा महाराजाना सही करण्याचा आग्रह केला, तेव्हाहि निर्धाराने त्यानी स्पष्ट नकार दिला. "नुसत्या सहीसाठी कशाला विनवण्या करता नि धाक दाखवता? छाती असेल तर उघड चौकशी करा. कट कोणी केले नि कां केले, त्याचा मुद्दापुरावा मी घालतो एकेकाच्या पदरांत प्रत्येक गोष्टीत रसिदंटाचा सल्ला घेतलाच पाहिजे, हे बंधन म्हणजे काय मी तुमच्या रसिदंटाचा लाळघोट्या होऊन बसू की काय? आप्पा महाडीक, येलोजी मोहिते, तो तुमचा यशवंतराव फौजदार आणि तो विठ्ठल सखाराम ऊर्फ आबापारसनीस, यासारख्या बिलंदर टग्यांना मी काय म्हणून क्षमा करावी नि त्याना पूर्ववत तनखे द्यावे? होणार नाही ते माझ्याकडून."
कारन्याक- चिटणिसाने तुम्हाला बदसल्ला दिला.
महाराज- मी कधीच कोणाचा सल्ला घेत नाही. मला योग्य दिसेल तेच मी आजवर करीत आलो आहे. नामदारसाहेब, आपण एवढे दूर मुंबईहून आलात तरी तुमचा सल्ला मी जुमानीत नाही, तर शेजारच्या घरातून चटकन माझ्या वाड्यात येणार्या चिटणिसादिकांचा सल्ला मी थोडा जुमानणार आहे. १८१९ साली तुमच्या तहनाम्यावर सही केली तेव्हा मी चिटणिसाला, ते जवळ असूनहि नाही विचारले. मला योग्य वाटले नि मी सही केली.
कारन्याक- चिटणिसाने लंडनला जाण्यासाठी जहाज ठरविले. कशासाठी?
महाराज- माझे वकील लंडनला पाठविण्यासाठी.
कारन्याक- मग गेले का नाहीत ते वकील? राहिले कशाला?
महाराज- कां राहिले? ते हे विलोबीसाहेब सांगतील. त्यानाच विचारा दुसरे जहाजमिळेपर्यंत थांबले ते. मिळाल्यावर गेले.
कारन्याक- जहाजाचे काय करणार आहात?
महाराज- जहाज मिळाले तर मी सुद्धा लंडनला जाईन. काय हरकत आहे?
कारन्याक- चिटणिसाने डॉ. मिलनला मध्यस्थीसाठी का घेतले?
महाराज- चिटणिसाने नव्हे मी त्यांना नेमले आहे. चिटणिसाला तुम्ही अटकेत टाकले, तर माझी दरबारी कामे करायला कोणी हवा का नको? डॉ. मिलनला नेमले, तर त्यालाहि सातार्याला येण्याचा तुम्ही प्रतिबंध करता. सारे कोकणस्थ ब्राम्हण ग्रामण्य प्रकरणामुळे चिटणिसावर खवळले आहेत.
(येथे कारन्याकने प्रामण्य शब्दाचा अर्थ विलोबीला विचारला.)
कारन्याक- महाराज नेहमी कोणाची सल्ला मसलत घेतात आणि कोणकोणते नातेवाईक महाराजाना सध्या अनुकूल आहेत?
महाराज- मी कोणाचा सल्ला घेतो, ते मी सांगितलेच आहे. नातेवाईक पुष्कळ आहेत.
कारन्याक- बाळासाहेब सेनापतीवर महाराजांची मेहरबानी बरीच दिसते.
महाराज- बाळासाहेब माझ्यापुढे पोर आहे. त्याचा सल्ला मी कशाला घेऊ?
नंतर आप्पासाहेब भोसल्याला त्याचा तनखा नि मालमत्ता देण्याविषयी कारन्याकने विचारणा केली. त्यावर माझी त्या बाबतीत केव्हाहि तक्रार नव्हती नि आज नाही, असा महाराजानी खुलासा केला आणि ओवान्सने त्याला पुष्टी दिली. तेव्हा कारन्याकने अन्दरसनला विचारले, - मग तो पराडकर उलटे का सांगत होता?
कारन्याक- आमच्या २३ व्या पलटणीचे शिपायी राजवाड्यात भेटीला आले नव्हते का?
महाराज- हे सारे बतावणीचे खोटे कपटनाटक आहे.
कारन्याक- हे शिपायी ३० वर्षे आमच्या नोकरीत आहेत ते खोटे कसे सांगतील?
महाराज- अहो, हे आमचे मोहिते नि महाडीक, सात पिढ्यांचे आमचे नोकर, त्याना खोटे बोलायला नि करायला काही वाटले नाही. सात पिढ्यांच्या पुढे तीस वर्षांच्या नोकरीची काय मातबरी! शिवाय ते तुमचे तोतया चतुरसिंगांच्या बंडात आमच्यावर आरोप करणारे फिर्यादी होते. पण अखेर चौकशीत लबाड खोटे ठरले. आमचे दिवंगत बंधू भाऊसाहेब यांचा तोतया निघून धामधूम माजली होती. त्या भानगडीत हेच तुमचे शिपाई पुन्हा खोटें लबाड नि कारस्थानी, असे ग्रांट डफ साहेबानेच चौकशीत ठरवले. अशा लोकांवर तुम्हाला विश्वास तरी कसा ठेववतो हेच मला समजत नाही.
कारन्याक- हे पहा, महाराज, मी सांगतो तसे करा, नाहीतर हे चांगले राज्य गमाऊन बसाल.
महाराज- जाईना का है राज्य. मला नाही राज्याची पर्वा. हव्या त्या कबुलीजबाबावर सही करायला मी काही बाजीराव नव्हे, कारन्याकसाहेब, तो आणि त्याचे लोक हयात आहेत. मी तुमच्या खडर्यावर सही करण्यापेक्षा मरण पत्करीन, समजलात! माझा जीव घेण्याऐवजी अवमानात मला सडत ठेवण्याचा तुमचा डाव दिसतो. मी तो पत्करणार नाही. घ्या घ्या. आत्ताच घ्या माझे राज्य तुमच्या ताब्यात. जेव्हा माझ्याविषयी तुमचे सारे संशय नाहीसे होतील, तेव्हा, वाटल्यास परत द्या, अगर देऊ नका.
कारन्याक- बाजीरावचा घेतलेला प्रदेश त्याला परत देण्याचा आमचा अजून काही विचार नाही.
महाराज- बाजीरावचा प्रदेश अति सुपीक आहे. तो बिचारा भेदरट भटजी होता, म्हणून तुम्ही त्याचे राज्य घेतलेत, मी त्याच्यासारखा डगमगणारा नव्हे. माझे चिमुकले राज्य राहिले काय नि गेले काय. माझी कशालाच काही हरकत नाही. आमचे मराठी स्वराज्य शिवाजी महाराजानी कमावले, ते संभाजी महाराजानी गमावले. पुन्हा ते थोरल्या शाहू महाराजाने परत मिळवले नि माझ्या आजाने घालवले आणि मी पुन्हा ते परत मिळविले. आपण डाकगाडीने येथे आलात. चला, मी पण येतो तुमच्याबरोबर डाकगाडीने, मला कलकत्याला पाठवा. लंडनला नेऊन ठेवा. काय वाटेल ते करा पण प्राण केला तरी असत्त्यापुढे या प्रतापसिंहाची मान वाकली. जाणार नाही.
कारन्याक- हे पहा, महाराज, मी फार तर आणखी एक दोन दिवस येथे थांबू शकेन. तोवर महाराजानी विचार करावा.
महाराज- माझा विचार मी स्पष्ट कळविलाच आहे. आणखी काय विचार करायचा!
नंतर गवर्नरादि मंडळीना पानसुपारी अत्तर वगैरे देऊन महाराज परतले.
ता. २६ आगष्ट सोमवार सन १८३९. या दिवशींच्या मुलाखतीतहि पुन्हा कारन्याकने महाराजाना "हा मेमोरॅण्डम म्हणजे एक तहनामाच आहे, तेव्हा त्यावर सही करायलामहाराजाना काही हरकत नसावी." असा साळसूदपणाचा उपदेश केला.
महाराज- एवढा माझ्या सहीचा का तुमचा आग्रह?
कारन्याक- हे पहा, संशय उत्पन्न झाला, तेव्हा त्याचा निरासहि झाला पाहिजे.
महाराज- सहीने निरास कसा होणार? गेले दोन दिवस मी अट्टहासाने सांगत आहे की माझी तुम्ही उघड चौकशी करा नि संशयाचे निराकरण करून घ्या. पण तुम्ही ते मनावरच घेत नाही. या खर्ड्यावर मी सही केली की जुना तहनामा आणि एलफिस्टन, मालकम आणि लॉर्ड क्लेअर यांच्याशी झालेले इतर करारमदार सारे रद्द होणार. तुम्ही निघून गेला, म्हणजे दुसरा गवर्नर येणार. पुन्हा लुच्चा लोकांनी उचल करायची. कटांची उभारणी करायची, त्या नव्या गवर्नराचे कान भरायचे का या महाराजाना कट करण्याची नि ते नाकारण्याची सवयच आहे. त्याने पुन्हा नवीन खर्डा ठेवायचा आमच्यामुळे. आणि हे गाडे अखंड चालूच रहायचे त्याला अंतच रहाणार नाही मग तेव्हा तुम्हाला जे काही करून टाकायचे असेल, ते आत्ताच एका झटक्यात आटपा. मी तहनाम्याचा लवमात्र जरी भंग केला असता, तर तुमचा सल्ला धिक्कारला नसता. हे पहा नामदार गवर्नरसाहेब, फायद्याचा किंवा स्वार्थाचा लोभ धरून, मी आपले चारित्र्य कलंकीत करून घेणारा नव्हे.
छावणीतून महाराज परतले. गवर्नर कारन्याक आणि त्यांचे हापसर दोस्त, प्रतापसिंहाचा तेखदारपणा पाहून चारीमुंडे चीतच झाले. सत्यासाठी स्वत्वावरहि निखारे ठेवणारा मर्द मराठा यापूर्वी त्यांच्या पहाण्यात वा ऐकण्यात नव्हता. होळकर, गायकवाड, शिंदे वगैरे त्यानी पुष्कळ पाहिले होते आणि नजरेच्या हालचालीने दबविलेलेहि होते. पण हा नमुना काही और असाच आढळला. प्रतापसिंहाच्या या मुलाखतीचा तपशीलवार अहवाल डायरेक्टर कोर्टापुढे मांडताना, माजी रसिदंट (मागाहून डायरेक्टर) कर्नल रॉबर्टसन म्हणाले- "प्राचीन रोमन साम्राज्याच्या नैतिक सुवर्णयुगाला साजेशोभेसेच वर्तन महाराजानी केले. त्यांच्या सत्याग्रही तडफेतच त्यांच्याविरुद्ध उभारलेल्या बनावट किटाळांचा फोलकटपणा सिद्ध होत आहे."
ता. २७ आगस्ट, मंगळवार, उजाडला, प्रतापसिंहाला वठणीवर आणायचे कसे, हा मोठा बिकट प्रश्न मुंबईकर गोर्या शहाण्यांपुढे पडला. दोन प्रहरी ओवान्सकडून एक भालदार महाराजाकडे आला. रसिदंट साहेब महाराजांची भेट घेऊ इच्छितात, असा निरोप त्याने दिला. ठीक आहे. असा जबाब घेऊन तो परत गेला. संध्याकाळी ५ वाजता, ओवान्स स्वता अखेरची शिष्ठाई करायला राजवाड्यात आला.
ओवान्स- गवर्नरसाहेब उद्या जाणार, तेव्हा मेमोरैण्डमवर महाराज सही करणार किंवा नाही, याचा खुलासा त्याना हवा.
महाराज- गेले तीन दिवसांच्या मुलाखतीत त्याना खुलासा मिळालाच नाही की काय? मी स्पष्ट स्पष्ट नकार दिलेलाच आहे.
ओवान्स- हेच अखेरचे उत्तर समजायचे काय?
महाराज- होय.
ओवान्स- महाराज सही करू इच्छित नाहीत, असेच मी जाऊन सांगू का?
महाराज- होय, अगदी अस्सेच जाऊन सांगा.
ओवान्सने सलाम केला आणि ही मुलाखतींची परवड येथे संपली. वाचकांना येथे एक मुद्दा मुद्दाम सांगायचा आहे. वरील संभाषणे मी प्रसंगानुरूप कल्पनेने चितारलेली असतील असे त्याना वाटण्याचा संभव आहे, तसे काहीहि नाही. या तीन दिवसांच्या मुलाखतींची गवर्नरच्या मदतनिसानी तपशीलवार संभाषणांची टांचणेच (मिनिटस) तयार केलेली होती. ती छापलेली आहेत. त्यांवरून मी संभाषणांची सरळ भाषांतरे करून वाचकांपुढे ठेवली आहेत.
ता. २८ ला गवर्नर सर जेम्स कारन्याक आले तसे हात हालवीत परतले.
प्रकरण २१ वे
आंग्रेजानी छत्रपतीला भटी थडग्यात गाडले
"हिंदुस्थानात जाणार्या गवर्नरांची अशी एक समजूत होऊन बसली आहे की त्यांचे स्वतःचे प्रस्थ नि महत्व वाढविण्यासाठी, खऱ्या खोट्या गुप्त कटांचे शोध लावायचे, राजद्रोह हुडकून काढायचे, जाहीरनामे फडकवायचे, लढाया द्यायच्या, जुन्या राजाना उखडून त्यांच्या जागी नवे थापायचे, हेच त्यांचे काम नव्हे, असला काही उपव्याप केल्याशिवाय स्वदेशी परत येणे म्हणजे इभ्रतीचे नि नामुष्कीचे काम असेच त्याना वाटते." - सर चार्लस फोर्ब्स.
अंग्रेजी बनिया कंपनीचा लहानमोठी अधिकारी असो वा एकदा गोरा भटक भडभुंज्या फिरस्ता असो, त्याच्यासमोर हिंदी आदमी गेला का एकदम मरगळायचा. तो जे म्हणेल त्याला होकाराची मान हालवायचा, अशी हा वेळ पावेतों हिंदुस्थानात एक विलायती जादू फैलावलेली होती. बिचारा रावबाजी याच लालबुंद गोर्या तोंडाच्या धमकीपुढे दंगला नि अखेर महाराष्ट्रातून परागंदा झाला. पण कारन्याकसारख्या उखड्या नि कडव्या गोर्या गवर्नरला "जा तुला काय करता येईल ते करून घे, मी तुझा उपदेश जुमानीत नाही." असा सडेतोड जबाब देऊन, त्याच्या डोक्यावर आत्मतेजाचे मोहरीचे पलिस्तरं थापणारा एकटा छत्रपति प्रतापसिंहच त्या काळच्या गोर्या गुर्मीबाजाना भेटला. स्वाभिमान नि सत्याभिमान या शिवाय त्याने इतर लौकिकी परिणामांची पर्वाच केली नाही. सत्ताबाज कंपनी सरकारच्या गवर्नरला धुडकावण्याने काय परिणाम होईल, याची प्रतापसिंहाला स्पष्ट अटकळ होतीच. वेदोक्तावरून चित्पावन भटे उस्तळळी काय आणि त्या ठिणगीने त्यानी राजकारणी कटांचा आपल्या भोवती वणवा पेटवून, त्यावर मुंबई सरकारकडून खुनसटपणाची घासलेटाची पिंपे ओतवली काय, याचा त्याने पुरेपूर अंदाज काढून कौरवांच्या चक्रव्यूहात एकट्या सापडलेल्या अभिमन्यूच्या धैर्याने निधिटाईने, परिणामांची पर्वा न करता, घडेल त्या मुकाबल्याला शौर्याने तोंड देण्याचा तो निश्चय करून बसला.
गेले तीन दिवस झालेल्या मुलाखतींचा तपशीलवार अहवाल महाराजानी मुंबईला रंगो बापूजीकडे रवाना केला. या खेपेला पक्के धोरण बांधून, दोन मार्गानी दोन हारकारु (डाकवाले) मुंबईला पाठविले. एक गेला सातारा पुणे नेहमीच्या रस्त्याने आणि दुसरा गेला चिपळूण मार्गाने. पैकी पुण्यावरून जाणार्या हारकारुला कंपनीच्या चौकीदारानी खोपोलीजवळ खंडाळा घाट उतरताना पकडले नि त्याचे टपाल जप्त करून पुण्याला पाठवले. चिपळूणकडचा हारकारु जहाजाने सुखरूप मुंबईला पोचला. पण टपाल रंगोबाच्या हाती पडेपर्यन्त इकडे कारनाकी सुरंगाचा स्फोट होऊन छत्रपतीच्या देवाच्या ठिकर्या उडाल्या होत्या. या टपालांत कै. कोगनलाहि महाराजांचे एक पत्र होते. त्याचा सारांश- "आमचा नि कारन्याक गवर्नरचा खटका उडाल्यांचा तपशील रंगोबाने सांगितलाच असेल. आमच्या दुस्मानदारानी आमच्या नाशासाठी कट केले हे ऐकून घ्यायला गवर्नर तयार नाहीत. आपण मागे सांगितलेच होते की प्रसंग आल्यास आपण आमची फिर्याद विलायतेच्या इंग्रजी दरबारात मांडण्याची खटपट कराल. म्हणून. कृपा करून आता तसे करावे. रंगोबाला आपल्या बरोबर लंडनला जाण्याचा आम्ही हुकूम दिलेला आहे. या प्रकरणातल्या बित्तंबातमीची आणि कागदपत्रांची त्याच्याइतकी माहिती कोणालाहि नाही. पैशाचीहि मी व्यवस्था लावलेली आहे. फोर्ब्स साहेबांच्या मेहरबानीखाली आमचे काही वकील पूर्वीच लंडनला रवाना झाले आहेत, आपण डॉ. मिलन यांचाहि सल्ला घ्यावा त्याना संपूर्ण हकिकत माहीत आहे. गवर्नरसाहेब आम्हाला भलभलत्या कबुली जबाबांवर मुकाट्याने सह्या करायचा भारीच आग्रह करीत होते. पण सत्याला, स्वाभिमानाला नि आमच्या कुळधर्माला कलंकित करणारे कसलेहि दुष्कर्म आमच्या हातून, प्राण गेला तरी होणार नाही. एवढे तरी आम्ही त्याना पटवून दिले. एकंदरीत, आता या इंग्रजी राज्यात न्याय ही चीज उरली नाही, असेच म्हणावे लागते." (ता. ४ सप्टेंबर १८३९).
रंगो बापूजीने हे महत्वाचे पत्र कोगन मसकतला जाण्यासाठी जहाजावर चढत असतानाच त्याला दिले. बंदरावर कोगन, त्याचे तीन मसकती आरब मित्र आणि रंगो बापूजी यांच्या, एका बाजूला जाऊन, काही मसलती ठरल्या. सगळ्यानी कोगनशी हस्तांदोलन केले. जहाज चालू झाले.
ता. ३० आगष्ट १८३९ रोजी महाराजानी रंगो बापूजीला एक लांबलचक पत्र पाठवून आपल्या अखेरच्या इच्छा कळविल्या होत्या. ओवान्सने नातूच्या संगनमताने केवळ आप्पासाहेबालाच फितवले नसून, आमच्या सर्व दरबाऱ्यात आणि सैनिकांतहि फितुरी माजवलेली आहे. आतापर्यंत बळवंतराव चिटणीस, त्यांचा धाकटा भाऊ यशवंतराव आणि तुम्ही तिघेच माझ्याशी इमानाने राहिला आहात. आमच्या जवळ विश्वासाचे आता कोण? तर आमच्या दोन राण्या, कन्या गोजराबाई नि बाळासाहेब. तुम्ही आता विलायतेला जाऊन तेथल्या दरबारात आमचे प्रकरण मांडावे. तिकडे जाताना तुम्हाला अनेक छळ नि संकटे सोसावी लागतील. पण ईश्वरावर भरंसा ठेऊन, माझ्यासाठी हे काम तुमही केलेच पाहिजे. आमच्यावर आणलेले आरोप एक तर सिद्ध करा, नाहीतर मागे घ्या, असे खडखडीत आव्हान तुम्ही द्यावे. माझ्या जिवात जीव असेतोवर तुम्हाला कशाची काही काळजी नाही. पण माझा हातपाय झाला, तर मागे दोन राण्यांवर आपले वैरी काय प्रसंग आणतील, तिकडेहि तुमचे लक्ष्य असले पाहिजे, आमचे विचार, हेतू नि निश्चय तुम्ही पक्के जागता, त्यांविरुद्ध राण्यांकडून पैरी काही भलतेसलते लिहून घेतील तर ‘माझे प्रतिनिधी’ म्हणून तुम्ही त्या कारस्थानाला स्पष्ट विरोध करावा. पोटी पुत्र नसल्यामुळे, जवळच्या नातेवाईकांतला एकादा चांगला मुलगा दत्तक घेणे भाग आहे. बाळासाहेब सेनापतींची बायको सध्या गरोदर आहे. तिला सुदैवाने मुलगा झालाच तर त्याला दत्तक घेण्याचा मानस आहे. मुलगी झाली, तर मग काय! इतरत्र शोध घ्यावा लागेल. तुमची इमानदारीची शपथ तुम्ही पुरेपूर पाळाल, अशी माझी खात्री आहे."
सातार्यास तोफखाना लप्कर गेले
पुढील बंदोबस्ताच्या सूचना ओवान्सला देऊन कारन्याक २८ आगष्टला निघाला नि ३० तारखेला पुण्याला पोहोचला. हिज मॅजेस्टीच्या ४१ व्या रेजिमेण्टची एक कंपनी २१ व्या देशी पायदळाच्या २ कंपन्या आणि २५ व्या देशी पायदळाच्या ३ कंपन्या, याना त्याने २४ तासांच्या इषाऱ्याने कूच करण्याचा हुकूम देऊन, ता. ३१ आगष्टला सातार्याला रवाना केल्या. ता. ४ सप्टबरला रेसिडेन्सीच्या कापात येऊन उभ्या राहिल्या. दुपारी २ वाजता त्यांची सगळ्यांची परेड झाली. २५ व्या रेजिमेण्टच्या तोफखान्याने राजवाड्यावर चालून जाऊन राजाला कैद करावयाचे. २१ व्या कंपनीने नि ८ व्या रेजिमेंटने अदालत कचेरीवर आणि बाळासाहेब सेनापतीच्या घरावर जायचे, त्याच्या घोडेस्वारांचा ताबा घ्यायचा. असे हुकूम त्या पलटणीना दिले. सकाळपासूनच सातारा राजधानीत नि आसपासच्या गावांतल्या ब्राम्हण समाजांत काहीतरी गडबड उडून राहिली होती. बाळाजीपंत नातू पाच सहा वेळा शहरात येऊन निरनिराळ्या लोकाना भेटून गेला. ज्या घरात किंवा वाड्यात तो जाई, तेथे पाठोपाठ जोशी किबे वगैरे मंडळी बरोबर आणखी दहा पंधरा असामीना घेऊन शिरताना अनेकांनी पाहिले, ही बातमी महाराजानाहि समजली. सकाळी १०-११ च्या सुमाराला रसिदंट ओवानहि वाड्यावरून घोडा पिटाळीत गेला. कापात पुण्याचे नये लष्कर आल्याची बातमी शहरात याच लोकात चलबिचल उडाली. पेढीवाले नि व्यापारी घाबरले. लुटालूट होणार की काय, या भीतीने जो तो मिटल्या तोंडी आवराआवर करू लागला. दुपारी ४ च्या सुमारास काही व्यापारी महाराजाना भेटायला आले. महाराजानी सांगितले "कोणी काही भिण्याचे कारण नाही. घरोघर स्वस्थ रहा. तुमच्या केसालाहि धक्का लागणार नाही, ही जिम्मेदारी माझी आहे."
हिंदुस्थानातला पहिला निःशस्त्र सत्याग्रह
काय होणार, याची महाराजाना पुरी कल्पना होती. कंपनीच्या लष्करी आक्रमणाला सपशेल तोंडघशी पाडण्याचा त्यांनी बेत केला. ‘मी जर सर्वस्वी निष्कलंक आहे, तर कंपनी सरकारच्या सशस्त्र आक्रमणाची मी कशाला पर्वा करू? ज्यांनी आपल्या न्यायबुद्धीचाच खून पाडलेला आहे. सांगलीकर नातू किबे यांसारख्या राजद्रोही हरामखोराना लांच नि जहागिरींचे मलिदे चारून माझ्या विरुद्ध उठविलेले आहे, खोटे नाटे दस्त नि शिक्के करणाऱ्याना बक्षिसे देऊन पाठीशी घातले आहे, त्यानी माझ्यावर शस्त्र चालवून माझा घात केला, तर त्यात आश्चर्य तरी कसले? सख्खा पाठचा भाऊच जेथे वैर्याना सामील, तेथे आपण प्रतिकार तो काय करायचा?`
काहीतरी निश्चित धोरण ठरवून महाराजांनी बाळासाहेब भोसले सेनापतीला निरोप पाठवून, आपले सगळे सैन्य राजवाड्यापुढे कवायतीला बोलावले. स्वतः कमाण्डरचा पोषाख घालून सैन्याची कवायत घेतली आणि अखेर शस्त्रे खाली ठेवण्याचा हुकूम फर्माऊन शिपायाना बराकीत पाठवून दिले. स्वतः बाळासाहेबाच्या कमरपट्यातली समशेर काढून घेतली आणि सारी शस्त्रे हुजर्याकडून गोळा करवून वाड्याच्या तळघरात नेऊन ठेवायला सांगितले. वाड्यासमोर तोफा होत्या. त्यातली दारू काढून, त्या पाण्याने धुऊन रिकाम्या करवल्या. नंतर दौण्डीवाले बोलावून त्यांच्याकडून सातारा शहरभर निःशस्त्र सत्याग्रहाचा आपला निर्धार जाहीर करवला. प्रजाजनाना आपल्या गळयाची शपथ घालून विनविले की "आज रोजी कंपनीच्या सोजरांनी राजवाडयावर हल्ला केला, मला किंवा माझ्या कुटुंबियाना ठार मारले, वाडा लुटला, किंवा त्याचबरोबर तुमची घरेदारेहि लुटली, तरी कोणीहि आपला हात वर करता कामा नये. प्रतिकार करील तो माझा नव्हे. राजनिष्ठेच्या बतावणीने लष्करावर धोंडेमार करण्याची कोणी चिथावणी दिली तरी ती जुमानू नका जे होईल ते स्वस्थ घरोघर राहून पहा." असा जाहीरनामा दौण्डीवाल्यानी दिवेलागणी होईपर्यन्त तमाम राजधानीत पुकारला. सगळ्याना आश्चर्य वाटले, पण सगळेच अस्वस्थ झाले. सशस्त्र चढाईला निःशस्त्र सत्याग्रहाने तोंड देण्याचा हा अखिल हिंदुस्थानातला अगदी पहिलाच प्रयोग होता आणि त्याची कल्पनाहि कोणाला आजवर नव्हती. तसे पाहिले तर या वेळी लोक निःशस्त्र नव्हते. दर घरटीला निदान दोन असामी ढाल तलवार भाला बंदूक घेऊन हूं म्हणताच बाहेर पडायला तयार होते. महाराजांचा तसाच बेत असता तर छावणीत तयार असलेल्या पलटणीची चटणी उडविण्याइतकी लढवय्या मराठ्यांची लोकसंख्या खुद्द एकट्या सातार्यातच होती.
आली-आली ती काळरात्र!
ता. ४ सपटंबर १८३९ बुधवारची संध्याकाळ झाली. आज बाळाजीपंत नातू आणि पुणे ते बेळगावपर्यन्त पसरलेल्या त्याच्या साथीदार भटांच्या कारस्थानांमुळे सातार्याच्या राजधानीत शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा भर मध्यरात्री खून होणार, या कल्पनेने अस्ताला जाणारा सूर्यनारायण रक्ताचे अश्रू टपटपा गाळीत रक्तबंबाळ तोंडाने सह्याद्रीच्या शिखराआड निघून गेला! तिकडे छावणीत ओवान्सने दिलेल्या थाटाच्या मेजवानीवर आप्पासाहेब भोसला हात मारीत होता. मेजवानी आटोपल्यावर आप्पा नि नातू यांच्या खास देखरेखीखाली गोर्या सोजरांच्या पलटणी सातारा शहराची सर्व नाकी अडवून उभ्या राहिल्या. खेचरे जोडलल्या तोफांचे खटारे खडा खडा कर्कश आवाज करीत निरनिराळ्या मोक्याच्या जागांवर येऊन उभे राहिले. रसिदंट ओवान्सची अश्वारूढ स्वारी या बंदोबस्ताची पहाणी करीत इकडून तिकडे शहरभर भरार्या मारू लागली. नागरिकानी घरोघरचे आपले दिवे मालवून सगळीकडे अंधार केला. रस्त्यात चिटपाखरूड फिरकत नव्हते. प्रजाजनांनी आपापली भोजने उरकून ते घरोघर चिंताक्रांत बसून राहिले. खुद्द छत्रपतीही भोजनोतर आपल्या महालात खुशाल झोपी गेले. निष्कलंक मनोवृत्तीला निद्रादेवी कधीहि बिचकत नाही. याचे प्रत्यंतर येथे दिसले.
शहरातल्या पोलीस चौक्यांवर मध्यरात्रीचा बाराचा गजर ठणाणू लागला. बाळाजीपंत नांतू ओवान्सच्या कानाला लागला. लष्कराची बिगुल वाजली. एकदम राजवाड्याला गोर्या सोजिरांचा बॅगनेटी वेढा पडला. कोठे काही दगाफटक्याचा अंदेशा नाही, असे लष्करी हेरानी येऊन सांगताच, दारू ठोकून डोळे लालबुंद झालेला घरभेद्या आप्पासाहेब पुढे त्याच्या मागे रसिदंट ओवान्स आणि चारपाच गोरे सशस्त्र सोजीर यमदूतांच्या तोर्याने राजवाड्यात घुसले. दरवाजावर नि सर्वत्र पहारेकरी उभे असूनहि कोठेहि कोणी त्याना मज्जाव केला नाही. हा चमत्कार पाहून ओवान्स तर थबकून उभाच राहिला. त्याला अचानक घातपाताचा संशय आला. बाळाजीपंत नातू होतेच मागे. त्यानी साहेबांच्या कानात वेदोक्त संजीवनी मंत्राचा फुंकर घालून पुढे ढकलले. राजवाड्यातला प्राण हरण करण्यासाठी घुसलेल्या त्या चांडाळानी देवघराचे पावित्र्य जुमानले नाही.
झनानखान्यातील राजस्त्रियांच्या अवहेलनेची पर्वा केली नाही. खाडखड बूट हापटीत ते छत्रपतींच्या शयनमंदिराकडे गेले, आप्पासाहेबाने ‘हे आमचे दादा` असे बोट दाखवून सुचविताच त्या वेळेचा महाराष्ट्राचा ओडवायर कर्नल ओवान्स इटदिशी पलंगाजवळ गेला आणि गाढ निद्रेत घोरत असलेल्या छत्रपतीच्या मनगटाला धरून खस्सकन त्याना पलंगावरून खाली ओढले. `टुम हमारे साथ च्यलो` असे म्हणून तो त्याना खेचू लागला. सत्याग्रही छत्रपति काहीहि प्रतिकार न करता मुकाट्याने चालू लागले. त्यावेळी ते फक्त मांडोळा नेसलेले होते. त्याशिवाय आंगावर दुसरे काहीहि वस्त्र नव्हते. छत्रपतीची अशा उघड्या बोडक्या अवस्थेत उचलबांगडी झालेली पाहून ऐकून झनानखान्यात रड्याओरड्याचा हलकल्लोळ उडाला. चाकर माणसे भयभीत होऊन हातात दिवट्या घेऊन सैरावैरा धावपळ करू लागली. त्या आकांताचे वर्णन एकाद्या निष्णांत कादंबरीकारालाच साधणारे आहे. सर्व लोक निःशस्त्र. तशात खुद्द महाराजांची सत्याग्रहाची शपथ, यामुळे कोणाचाच काही इलाज चालेना.
महाराजांच्या दंडाला धरून ओवान्सने त्याना राजवाड्याबाहेर आणले आणि तयार असलेल्या पालखीत त्याना घातले. जवळच उभे असलेल्या बाळाजीपंत नातूने महाराजांना जवळ जाऊन नमस्कार केला आणि उपरण्याने डोळे पुसण्याचे नाटक चढविले. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे प्रेत दख्खनच्या भिक्षुकशाहीच्या तिरडीवर चढलेले पाहून रसिदंट ओवान्सला स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला. बाहेरच्या खिडक्यांजवळ येऊन राजस्त्रियानी नि कुणबिणीनी रड्याओरड्याने सारे वातावरण हादरून सोडले. शहरात आकांताची एकच हाक गेली. भराभर सारे नागरीक घराबाहेर पडले. मध्यरात्रीचा वेळ, तरी सातारचा राजरस्ता नरनारीनी गजबजून गेला. अतिप्रसंग टाळण्यासाठी, ओवान्सने भोयाना पालखी उचलण्याचा हुकूम सोडला. पालखी चालू झाली. आपला प्रिय छत्रपति असा उघडावोडका नेताना पाहून नागरिकांच्या डोळ्यांतून अश्रूंचे धबधबे वाहू लागले, पण करतात काय महाराजांची सत्याग्रहाची शपथ पाळणे अगत्याचे होते. इतक्यात कोणी एकाने धावत धावत येऊन महाराजांच्या अंगावर आपल्या घरातील एक शाल आणून पांघरली. सत्याग्रहाचे थोर तत्व थोरच पथ्यासारखे पाळतील. सामान्य माणसाना त्याचे काय होय? दुक्खाचा आवेग सहन न झाल्यामुळे, वाड्यातले काही सेवक आणि कुणबिणी धावत आल्या नि आमच्या राजाला कुठे हो नेता असा हंबरडा फोडीत पालखीच्या पुढे पडल्या. भोई थांबले, ओवान्सने खूण करता सोजिरानी त्या सेवकाना नि कुणबिणीना बॅगनेटांच्या टोकानी भोसकीत बाजूला केले. सातारची माती राजसेवकांच्या रक्ताने भिजली. सातारच्या नागरिकानी आपल्या लोकप्रिय छत्रपतीला अखेरचा मुजरा केला आणि क्रिस्टाल नावाच्या एका लष्करी हापसाच्या देखरेखीखाली पालखी सातार्याच्या हदपार झाली.
तरीहि प्रतापसिंहांइतकाच एक तेखदार असामी मागे राहिला होता. बाळासाहेब सेनापति. महाराजांचे दडपण गेल्यावर तो हवा आकांत करायला तो मागेपुढे पहाणारा नव्हता. त्याने लढाया मारलेल्या होत्या नि लष्करी पांचपेचहि तो खेळलेला होता. त्याने आपल्या सैन्याला शस्त्रे देऊन, नागरिकानाहि उठवून, सोजरांच्या पिछाडीवर हल्ला करायला कमी केले नसते. पण ब्राम्हणी बुद्धीचा पोच खोल! नातूने दोन तीन सोजराना पाठवून बाळासाहेबाला कैद करवले आणि जलदी जलदीने खेचीत आणवून, महाराजांच्या पालखीत बळजबरीने घुसवले. बाळासाहेबाने ताडकन पालखीच्या बाहेर उडी मारली नि अस्तन्या सारीत त्वेषाने ओरडला, ‘‘खबरदार हरामखोरानो, ज्या छत्रपतीच्या जोड्याला स्पर्श करण्याची आजवर कोणाची प्राज्ञा नव्हंती, त्यांच्या बरोबरीला बसून छत्रपतीच्या पायांची नि तक्ताची मी अवहेलना करू काय? मी निःशस्त्र असलो, तरी अशाहि अवस्थेत पाचपन्नास सोजरांना लोळवायला कमी करणार नाही. मी महाराजांच्या पालखीबरोबर पायीच चालणार. माझी कुचाळी करील त्याचा जीव घेईन, सोडणार नाही." पालखीला हात लाऊन बाळासाहेब चालू लागला. मागोमाग हजारो लोक रेटारेटी करीत येतच होते. पलटणीच्या कपतानाने ते मुकाट्याने परतणार नाहीत, तर अंगावर सोजरांधी पलटण घालण्याचा धाक घातला. हे समजताच, महाराजानी एका हुजऱ्याबरोबर `परत जा` असा संदेश नागरिकाना पाठवला, म्हणून लोक परतले नि अतिप्रसंग टळला.
गाई म्हशीच्या गोठ्यात छत्रपति ।
आता सर्वश्रुत झालेल्या आंग्रेजी पालिशीप्रमाणे राजबंद्याचा अखेर मुक्काम कोठे, याचा थांग लागायचाच नाही. प्रतापसिंहाला कोठे नेणार, पुढे त्याचे काय करणार, याचा कोणालाच काही भागमूस लागे ना उद्या सूर्योदय होताच आपण सातारचे छत्रपति होणार, या खुषीने आप्पासाहेब चिकार विलायती दारू ढोसून छावणीतल्या तंबूत झोपी गेला. बाळाजीपंत नातूहि आपल्या सगळ्या उचापतींचा शेवट ठरल्याप्रमाणे, सातारच्या उद्याच्या दिवाणगिरी नेमणुकीने गोड झाला म्हणून, स्वर्गीय समाधानात विश्रांतीला गेला, ब्राम्हणांचा दुस्मान राजा मातीला मिळाला, म्हणून रात्रीच्या रात्री बातमी घेऊन शेकडो ब्राम्हण स्वयंसेवक गावोगाव रवाना झाले. ज्या ज्या गावात बातमी गेली. तेथल्या ब्राम्हणानी गावात पेढे वाटले आणि दुसऱ्या दिवशी उत्सव केले. (कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती मुंबईला मृत्यू पावल्याची बातमी जाहीर होताच पुणे सातारा येथील ब्राम्हणांनी असेच पेढे वाटले होते.)
रात्रभर आठ मैलांची मजल मारून क्रिस्टालने लिंब (निंब) गावात उजाडता मुकाम केला. एका पाटलाचा गाई म्हशी बांधण्याचा गोठा होता. तो मोकळा करून घेतला. शेण मूत सगळीकडे पसरलेले. शिवाय झुरळे चिलटे पिराया यांचा सुळसुळाट. अशा त्या गोठ्यात क्रिस्टालने छत्रपतीना बसायला सांगितले. एका घोंगड्यावर खांबाला टेकून महाराज शांत चित्ताने बसले. लघवी शौचाला जायचे तरी सोजरांच्या पहार्यात. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास महाराणी, कन्या सौ. गोजराबाई आणि काही सेवक नि कुणबिणी सोजरांच्या पहार्यात येऊन दाखल झाल्या. हरामखोर ब्राम्हणांच्या कारस्थानांमुळे, हिंदूंचा बादशहा गाई-म्हशींच्या गोठ्यात, सोजरांच्या पहार्यात बसलेला पाहून, राजवैभवात वाढलेल्या त्या राजस्त्रियांच्या काळजांचे पाणी झाले. गोजराबाईने बापाला असा पहातांच एक भयंकर किंकाळी मारली नि ती बेशुद्ध पडली. बिचारी या वेळी आठ महिन्याची गरोदर होती. बेशुद्ध पडताच गर्भपात झाला. चहूकडे जंगल, वैर्याच्या कैदेत सारी माणसे. अशा अवस्थेत त्या बिचारीला कसली मदत, औषध नि उपचार? दैवाची खैर म्हणून बिचारी जिवंत राहिली.
महाराजानी निःशस्त्र सत्याग्रह पुकारला म्हणून त्यांच्या पदरच्या अनेक शूर लोकाना खेद झाला. हाडाचे आम्ही मरहठ्ठे लढता लढता मेलो असतो. पण अप्रतिष्ठा करून घेतली नसती. क्रिस्टालबरोबर काम करणाऱ्या एका गोर्या लष्करी हापसराने ता. २ आक्टोबर १८३९ च्या आपल्या रोजनिशीत लिहून ठेवले आहे. (महाराजाना पकडताना) "आमच्यावर एक जरी गोळी कुठून आली असती, तर राजाची सगळी धनदौलत आमच्या लष्कराला लूट म्हणून- मिळवता आली असती. काय थोड़ी दौलत होती ती! मोहरानी रुपयानी भरलेल्या मोठमोठ्या हडपेवजा पेट्या एकावर एक रचून लांब रांगानी ठेवलेल्या होत्या. सोन्या चांदीच्या ताटा तबकांचे तर दिगार लावलेले होते. पण, राजा मोठा धूर्त, त्याने निःशस्त्र प्रतिकाराचे नवीनच तंत्र अंमलात आणून आम्हाला सपशेल बुचकळ्यात पाडले.”
महाराजांच्या कामाचा ठावठिकाणा समजताच राजवाडयातले सगळे सेवक, काही जवळचे नातेवाईक, यशवंतराव मल्हार चिटणीस आणि माधव मनोहर पोतनीस असे शंभर लोक येऊन लिंब गावात महाराजा शेजारी ठाण मांडून बसले. सगळे सशस्त्र नि संतापलेले असल्यामुळे क्रिस्टलला तेथून त्यांना हाकलण्याची छाती होई ना. जिकडे महाराज, तिकडे आम्ही असे त्यानी त्याला स्पष्ट बजावले. लिंब गावाला एक यात्राच भरली. खेडोपाडीचे लोक येऊन आसू भरल्या डोळ्यानी महाराजांचे दुरुन दर्शन घेऊन जाऊ लागले. कारन्याक गवर्नरने आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर छत्रपतीना पदच्युत केले खरे, पण पुढे त्यांची वासलाद कशी कोठे नि काय लावायची, याचे हुकूम त्याने कलकत्याहून मागविले. ते येईपर्यन्त तब्बल ९३ दिवस महाराजांची छावणी लिंब गावातच पडून राहिली.
कारन्याकचे बेकायदेशीर कर्म
बनिया कंपनीच्या सरकारचा मुंबईचा गवर्नर असला तरी त्याला एका हिंदी दोस्त राजाला पदच्युत करण्याचा अधिकारच काय? कोणी दिला? गवर्नर जनरलने? नाही. डायरेक्टरच्या कोर्टाने? नाही. लंडनच्या कण्ट्रोल बोर्डाच्या सीक्रेट कमिटीने? नाही. या मुद्यावर पुढे रंगो बापूजीने लंडनात डायरेक्टर कोर्टाला कायद्याच्या शब्दांवर बोट ठेवून खूप छेडले. खुद्द चेअरमनलाहि उत्तर देता आले नाही. उठल्याबसल्या कायदेबाजीची मिजास मारणार्या आंग्लाईला या पदच्युतीचे समर्थन करताना, “३३ वा जॉर्ज दिसरा, भाग १२ मधील ४३ व्या कलमाला” खिशात कोंबून, एखाद्या गावगुंडाच्या गुर्मीने कारन्याकच्या बदकर्माला पाठिंबा द्यावा लागला. ते कलम मुद्दाम येथे देत आहे.
‘It shall not be lawful for the Governor of Bombay......to make or issue any order for commencing hostilities, or levying war, or to negotiate or conclude any Treaty with any Indian Prince or State: (except in cases of sudden emergency, or imminent danger, when it shall appear dangerous to postpone such hostilities or Treaty), unless in pursuance of express orders from the Governor-General in Council, or from the Secret Committee, by the authority of the Board of Control."
आगाऊ काही सूचना इषारा न देता चक्क दरोडेखोराच्या धाटणीने कर्नल ओयान्सने प्रतापसिंहाला ४ सप्टेंबरच्या मध्यरात्री राजवाडचाबाहेर काढून, पदच्युत केले. त्याच दिवशी दुपारी छावणीत आप्पासाहेब भोसले नि कंपनी सरकारतर्फे ओवान्स यांच्या सह्यांचा ४ कलमी तहनामा झाला. त्यात पूर्वीचा १८१९ चा तहनामा कायम, पण पूर्वीचे सारे जहागीरदार आता कंपनी सरकारच्या आधीन आणि सातारा राज्याची हद्दही दक्षिणेस कृष्णा वारणा, उत्तरेस नीरा भीमा, पश्चिमेस सह्यादी नि पूर्वेला पंढरपूर विजापूरच्या सरहदीपर्यन्त, अशी निम्ति ठरवली. (प्रतापसिंह असून राजवाड्यातच राजा म्हणून आहे, तरीहि) त्याच्या नि परिवाराच्या खर्चासाठी सातारा खजिन्यातून दरमहा दहा हजार रुपये देण्याचे कलम ४ थे. याप्रमाणे तहावर आप्पा, ओवान्सच्या सह्या झाल्या. तिकडे पुण्यानजीक दापोडीच्या मुकामाहून कारन्याकने ता. ४ रोजीच, म्हणजे मध्यरात्रीचा आंग्लाई दरवडा घालण्यापूर्वीच प्रतापसिंहाला पदच्युत करण्यात आपली धोरणे काय आहेत, लोकापवाद टाळण्यासाठी आपण त्याच्या भावाला गादीवर का बसवीत आहो आणि उद्या तो भाऊ (शहाजी आप्पासाहेब) निपुत्रीकच मरणार, तेव्हा आपल्याला हे राज्य कायमचे खालसा करून, सरकारच्या तिजोरीत कशी भर घालता येईल, याचे रसभरीत वर्णनाचे पत्र ग. ज. लॉर्ड ऑकलण्ड याजकडे कलकत्त्याला रवानाहि केले होते. मी केलेल्या कर्माला हूजूरची मंजुरी असावी आणि प्रतापसिंहाला अखेर कोठे कसे ठेवायचे त्याचे हुकूम उलट डाकेने यावे, अशी प्रार्थनाही केली होती. आणि हा खलिता केव्हा रवाना झाला? तर प्रतापसिंह प्रत्यक्ष पदच्युत होऊन राजवाड्याबाहेर काढण्यापूर्वी दहा तास! चित्पावनांप्रमाणे अंग्रेजांचाहि एक गुण आहे, सद्गुण आहे. त्यांच्या जातभाईनी कोठे काहीहि केले तरी, बर्या वाईटाचा, सत्यासत्याचा, कसलाहि विचार न करता, त्याला पाठिंबा देऊन उचलून धरायचे. मयत रॉबर्ट ग्रांटच्या प्रतापसिंहाविरोधी सगळ्या उपदव्यापांना "ब्रिटिशाना बदनामीकारक” ठरविणार्या लॉर्ड ऑक्लण्डने अखेर कारन्याकच्या कर्माना पूर्ण पाठिंबा दिला. त्याला शाबासकीहि दिली. लंडनच्या वरिष्ठांकडेहि सगळ्या तपशीलाचा अहवाल पाठऊन दिला.
आप्पासाहेबाच्या नावाची द्वाही
५ सपटंबरची सकाळ होते न होते तोच सातारा शहरात नव्या छत्रपतीच्या आप्पासाहेब शहाजीराजे भोसले यांच्या नावाची द्वाही कर्णे तुताऱ्या शिंगे फुंकून जाहीर करण्यात आली. सर जेम्स रिवेट कारन्याक गवर्नर याच्या हुकुमाने प्रतापसिंहाच्या पदच्युतीचा नि आप्पासाहेबाच्या पदारोहणाचा ७ कलमी जाहीरनामा ओवान्सच्या सहीने राजधानीत नाक्यामोक्यांवर वाचण्यात नि चिटकविण्यात आला.
प्रतापसिंहाला का पदच्युत करण्यात आले. त्याची ठरावीक कारणेहि त्यात नमूद केलेली होती. रात्री राजवाड्यावर मुद्दाम ठेवलेल्या गोर्या पहारेकऱ्यांकडून रसिदंट ओवन्सने सकाळीच सपरिवार येऊन खजिन्याचा चार्ज घेतला आणि त्याला सीलबंद टाळी ठोकली. शहरातल्या ब्राम्हण पेठांत गुढ्या तोरणे उभारण्यात आली. देवळात लघु महा रुद्रांचे अभिषेक चालू झाले. शेकडो ब्राम्हण गृहस्थानी छावणीत जाऊन श्रीमान आप्पासाहेब छत्रपतीना हारतुरे नारळ अर्पण केले. भिक्षुकानी तीर्थप्रसाद नि आशीर्वाद देऊन दक्षणा निजवाया. बाळाजीपंत नातूना अप्पासाहेब भोसल्यांची दिवाणगिरी मिळाली, म्हणून सातारच्या मोठमोठ्या ब्राम्हणांच्या घरी त्यांना पानसुपार्या नि मेजवान्या होऊ लागल्या. ब्राम्हणेतर वस्तीत सुतकासारखी उद्विग्नता नि रडारड दिसून येत होती. कित्येक लोक घरेदारे सोडून प्रतापसिंहाच्या पाठोपाठ, तो जाईल तिकडे जाण्यासाठी तयारी करीत होते, तर कित्येक मोठ्या पहाटेला निघालेहि होते.
प्रतापसिंहाला दरिद्री बनवला
खुनशीपणा हा अंग्रेजी पिण्डप्रकृतीचा एक गुप्त गुण आहे. म्हणूनच बाळाजीपंत नातू नि चिंतामणराव सांगलीकर प्रभृति चित्पावन श्रेष्ठींचे नि अंग्रेजांचे मोठे सूत जमले. प्रतापसिंहाला पदच्युत करताना म्हणजे त्याच्या सर्वस्वावर मध्यरात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात दरोडा घालताना, त्याला एका वस्त्रानिशी कफल्लक निर्धन अवस्थेतच बाहेर काढला. प्रतापसिंह सत्ताधीश असताना, त्याने दोन खजिन्यांची प्राणप्रतिष्ठा केलेली होती. एक सरकारी ऊर्फ सार्वजनिक (पब्लिक) आणि दुसरा खानगी तो काही उधळ्या नि जुलमी नव्हता. रयतेचा पैसा रयतेच्या हितासाठीच राखून, खानगीकडे तो ठरावीक भाग घेत असे. खानगीचा खर्चही अत्यंत काटकसरीचा ठेवल्यामुळे, त्याच्या खाजगी खजिन्यात ३० लाख रुपये रोकड आणि शिवाय जमीनजुमला जाहीर वगैरे निराळे, एवढी संपत्ति होती. पण त्यातली एक पैसुद्धा त्याला बरोबर नेऊ दिली नाही. किंवा पुढे कधि तयाच्या हाती लागू दिली नाही. मोठ्या मेहेरबानी दरमहा १० हजारांच्या दिलेल्या नेमणुकीतच त्या बिचार्याला अंदाजे हजार मंडळींच्या परिवाराचे अखेरपर्यंत परदेशात पोषण रक्षण करावे लागले. १८ नवंबर १८३९ रोजी आप्पासाहेबाला रीतसर राजाभिषेक होईपर्यन्त, राजवाड्यातली दौलत नि खजिने रसिदंट ओवान्सच्या ताब्यात होते. तो आणि नवे दिवाण बाळाजीपंत नातू रोज वाडयात येऊन किबे जोशी यांच्या कारकुनी मदतीने तेथली ‘नवी व्यवस्था’ लावीत होते. या अवधीत किती लक्ष्मी वाड्यात राहिली नि किती काळ्या गोर्या भक्तांच्या भजनी लागली, याचा अंदाज खुद्द परमेश्वरालाहि लागला नाही, असे त्या वेळचे लोकमत होते. शक्य दिसते ते! कारण परमेश्वरच झोपी गेलेला असल्याशिवाय, अथवा आंग्लप्रेमाचा गांजा ठासून तो तर्रर्र पडल्याशिवाय, प्रतापसिंहासारख्या साधू छत्रपतीचे उच्चाटन इतक्या अलगज रीतीने कारन्याक-ओवान्स-नातू कंपूला करताच आले नसते.
खुनसटपणाची परमावधि
कलकत्त्याहून प्रतापसिंहाबद्दल निश्चित हुकूम येईपावेतो त्याला सपरिवार सातार्यापासून अवघ्या आठ मैलावरच्या खेड्यातच डांबून ठेवणे प्राप्त होते. पण सातारा राज्याच्या प्रजाजनांच्या हितासाठी सिंहासन मोकळे ठेवणेहि शहाणपणाचे नसल्यामुळे, आप्पासाहेबाचा राजाभिषेक उरकून घेणे अगत्याचे होते. राज्याच्या हद्दीत, राजधानीपासून थोड्याच अंतरावर प्रतापसिंह असतानाच, हा सोहळा उरकण्यात गवर्नरादि महात्म्यांना एका विशेष (आसुरी) आनंदाचा लाभ मिळवायचा होता. शिवाय, राज्याच्या हितासाठी सर्वस्वाचा नाश पत्करणारा बळवंतराव चिटणिस आणि गोविंदराव विठ्ठल महाजनी दिवाण या दोन उजव्या डाव्या हातांनाहि दाखवायचे होते की -
इंग्रज आणि ब्राम्हण जेव्हां होतात एक जीवाचे ।
त्या पुढतींना टिकतिल सत्याचे थेर आणि देवाचे ॥
म्हणून चिटणिसाला लगेच २७ सपटंबर १८३९ रोजी पुण्याला बंधमुक्त करून, तेथेच स्थानबद्ध करून ठेवले आणि गोविंदरावाला आक्टोबरात अहमदनगरच्या तुरुंगातून सोडून सातारला जाऊन रहाण्याची परवानगी मिळाली. हेतू हा कीं एकाने राज्यक्रांतीचा उत्सव पुण्यास बसून ऐकावा आणि दुसऱ्याने तो उघड्या डोळ्यानी प्रत्यक्ष पहावा.
बाळासाहेब सेनापतीचा छळ
बाळासाहेब भोसले सेनापति म्हणजे "प्रतापसिंहाच्या मागे छत्रपतीच्या गादीवर बसण्यालायक एकच लायक मर्द” असे अनेक पहिल्या रसिदंटांनी नि गवर्नरानी एकमुखाने प्रशंसा केलेला महाराजांचा चुलतभाऊ. त्याला नुसते प्रतापसिंहाबरोबर सुखाने हद्दपार होऊ देण्याइतकी माणूसकी नातूला नि ओवान्सला कोठली? लिंब गावांत मुकाम असतानाच ओवान्सने पत्र पाठवून, सैन्यातल्या शिपायांच्या पगार कपड्यांबाबद तुमच्याकडे शिलकी रुपये ५० हजारांवर येणे आहेत, ते पाठऊन द्यावे, असा हुकूम सोडला. प्रतापसिंहाप्रमाणेच बाळासाहेब एका वस्त्रानेच बाहेर पडलेला होता. ‘‘हिशोब पुरे व्हायचे आहेत. कारकुनाना विचारावे, तिजौरी वाडयातच आहे.’’ असा जबाब त्याने दिला. त्यावर आम्हाला ही भानगड तोंडातोंडी समजत नाही. एकतर सेनापतीने स्वतः येऊन हिशोब पुरे करून द्यावे अथवा वकील पाठवावाअसे सामने कळविले. वकील गेल्यावर सेनापतीने ५० हजाराचा जामीन द्यावा, असा हुकूम काढला. बाळासाहेबाने जामीन दिला.
प्रकरण २२ वे
महाराष्ट्राचा छत्रपति वनवासाच्या मार्गावर
वाईट बातमी बिनचूक नि लवकर फैलावते. प्रतापसिंहाला कैद करून लिंब गावात नेऊन ठेवल्याची बातमी रंगो बापूजीला मुंबईच्या सकटतारी (सेक्रेटरिएट) कचेरीत दुसर्या दिवशी म्हणजे ५ सप्टेबरलाच समजली. तो तेथे कामानिमित्त गेला असता, तेथल्या एका गोर्या हापसरानेच मिस्किलपणाने त्याला विचारले. "काय मिस्टर रंगोबा, तुमचे राजे झाले हद्दपार.. मग आता तुम्ही कोणाचे वकील?" त्यावर रंगोबानेहि तितक्याच तडफेने उत्तर दिले की तुम्हा क्रिस्ती आंग्रेजांप्रमाणे आमच्या बायका नवरे बदलीत नसतात. नवरा हदपार झाला किंवा मेला तरी त्याचेच नांव सांगतात, दुसऱ्याची कल्पनाहि मनात आणीत नाहीत. बाळासाहेब सेनापति, माधवराव पोतनीस नि यशवंतराव चिटणीस सारेच महाराजांच्या बरोबर लिंबाला ठाणे देऊन बसल्यामुळे, रंगो बापूजीच्या सातारच्या टपालाचा ओघच सुकला. लोकांच्या तोंडून काय बातमी येईल तेवढ्यावरच त्याला नि डॉ. मिलनला अवलंबून रहावे लागले, शिवाय राजासकट सगळाच परिवार क्रिस्टालच्या कडक पहारेबंदीत असल्यामुळे, त्यांच्या हालहवालीची खास माहिती मिळणे त्याना अशक्य झाले. यावरहि रंगो बापूजीने काय तोडगा काढला तो आपल्याला पुढे दिसून येईल.
राजाभिषेकाची कारन्याकची घिसडघाई
बनिया कंपनीच्या किंवा पार्लमेण्टच्या कोणत्याही कायद्याने हिंदी राजाला पदच्युत करण्याचा कसलाहि अधिकार गवर्नर कारन्याकला नसताहि, त्याने स्वताच्या झोटिंगी अधिकारात प्रतापसिंहाला एकाद्या भयंकर गुन्हेगाराप्रमाणे पकडून लिंबाच्या खेडयात बंदिस्त करून ठेवला. या कर्माचे आंबट आळणी समर्थन कलकत्याहून किंवा लंडनहून येण्याच्यापूर्वीच त्याने आप्पासाहेबांचा राजाभिषेक उरकून घेण्याची घिसडघाई केली. १० नवंबर १८३९ ला कारन्याकची स्वारी महाबळेश्वरला गेली. ठरल्याप्रमाणे रसिदंट ओवान्स त्याच्या भेटीला जाऊन लगेच सातार्याला परत आला. नंतर खंडेराव मामा शिर्के नि यशवंतराव फौजदार गवर्नरच्या भेटीला जाऊन, काही बातचीत करून परत आले. १६ नवंबरला गवर्नरची स्वारी सातार्याला आली. बाळाजीपंत नातू, खंडेरावमामा शिर्के नि यशवंतराव फौजदार रसिदंटासह त्याला एक कोस सामोरे गेले. कारन्याकच्या बरोबर त्याची बायको, एडीकाँग असलेला त्याचा एक मुलगा, विलोबी सेक्रेटरी आणि एक डॉक्टर एवढे वर्हाडी होते. रेसिदंटच्या बंगल्याजवळ येताच आप्पासाहेबाच्या हुकुमावरून त्याना तोफांच्या सरबत्तीची सलामी देण्यात आली.
१७ तारखेला दुपारी १२ वाजता आप्पासाहेब गवर्नरच्या भेटीला छावणीत गेला. आप्पासाहेबाची राणी (धाकटी बायको) दुपारी २ वाजता वैभवशाली थाटामाटात गवर्नरीण बाईला भेटायला आली. राजवाडयात पायधूळ झाडण्यांचे निमंत्रण दिले. ४ वाजता कारन्याक आप्पासाहेबाच्या बंगल्याला भेट द्यायला आले. गवर्नराच्या स्वागतासाठी नवे छत्रपति रस्त्यावर सामोरे अनवाणी चालत गेले. सगळे जहागीरदार तेथे हजर होते. त्यांचा आप्पासाहेबाने गवर्नरशी प्रस्तावना विधि उरकला. भोसले राणीने गवर्नरणीचे असेच स्वागत केले. दुसरे दिवशी १८ तारखेला शहरात दीपोत्सव करण्याची आप्पासाहेब महाराजाने आज्ञा केली.
दुपारी ३ वाजता आप्पासाहेबाची धाकटी पत्नी दरबारी भरजरी पोषाख करून भालदारांच्या ललकान्यात, नवीन उभारलेल्या नि शृंगारलेल्या दरबार मण्डपात येऊन दाखल झाली. जहागीरदार, सरदार, मानकरी, नागरीक एकेक येऊन आपापल्या जागांवर बसत होते. बाहेर मंगल वाद्यांचा घणघणाट चालू होता. दिवे लागल्यावर ८ वाजता गवर्नर कारन्याक आणि श्रीमंत छत्रपति आप्पासाहेब भोसले हत्तीच्या अंबारीतून मिरवत मिरवत दरबार मंडपाजवळ आले. कंपनीचे आणि छत्रपतीचे सैनिक परातीत दोनी बाजूला चालत होते. रसिदंट ओवान्स आणि जहागीरदार मंडळी प्रथम मंडपांत शिरले. मध्यभागी सिंहासन मांडले होते.
गवर्नर आणि आप्पासाहेब हातात हात घालून दरबारात आले. कारन्याकने आप्पासाहेबाला हात धरून सिंहासनावर चढविले आणि आपण समोर उभा राहून, नव्या छत्रपतीला सात प्रकारचे पोषाख आणि जवाहिराचे दागिने नि पुष्पहारांचा त्याने आहेर केला. तोफांची धडेबाजी गरजली. नंतर आप्पासाहेब सिंहासनावरून खाली उतरून गवर्नराबरोबर एका कोचावर बसले. दरबारी पाहुण्यांना नि गवर्नराबरोबर आलेल्या गोर्या अतिथींना पानसुपारी अन्तरगुलाब वाटण्यात आल्यावर, गवर्नरसाहेबांची स्वारी परिवारासह निघून गेली.
नंतर भटे बामणे पुढे सरसावली. त्यानी मंत्रघोष करून आप्पासाहेबावर अक्षता फुले उधळली, कुंकुमतिलक लावले. नारळ दिले, जहागीरदारानी नजराण्याचे आहेर दिले. बाळाजीपंत नातूने स्वतासाठी सणई चौघडा नि नौबदीच्या वर्षासनाची सनद सहीसाठी पुढे केली. त्यावर आप्पासाहेबानी सही केली. [त्या काळी नौबदीचा मान सर्वात श्रेष्ठ समजला जात असे.] आणखी दोन सनदांवर नातूने आप्पासाहेबाच्या सह्या घेतल्या. एक आपल्या जावयासाठी (निळकंठशास्त्री थत्ते याचा पुत्र) आणि दुसरी चाळा जोशी नावाच्या एका भिक्षुकभटांसाठी. सर्व सनदांवर शिक्के मोर्तब झाले. नंतर रसिडेन्सीतल्या बड्या पाहुण्याच्या मेजवानीसाठी आप्पासाहेबाने फळफळावळ, मेवामिठाई, देशी पक्वान्ने आणि उंची विलायती दारूच्या बाटल्या पाठवून दिल्या. आतापर्यंत राजवाडयातले जवाहिरखाने नि खजिने टाळेबंदीत होते. रसिदंटानी त्याच्या किल्ल्या गवर्नरच्या हस्ते आप्पासाहेबाला दिल्यामुळे, सर्व सत्ता नि मत्ता पूर्णपणे ताब्यात आली.
इतकेच नव्हे तर यशवंत मल्हार चिटणिसाने प्रतापसिंहाची राजमुद्रा, दरबारी तलवार, मोर्चेले नि रत्नजडीत चौऱ्या लिंबगावाला नेल्या होत्या. नातू दिवाणाच्या हुकमाने त्या सर्व वस्तु जबरीने परत आणवून आप्पासाहेबाच्या हवाली करण्यात आल्या. बाळाजीपंत नातूला दिवाणगिरी मिळाली. बंधुद्रोही आप्पासाहेब भोसले छत्रपति झाला. प्रतापसिंहाला देशोधडीला लाऊन या दोघाहि, कटाग्रणींचे मनोरथ कारन्याककृपेने पूर्ण झाले. हिंदु धर्माचा नि ब्राम्हणांचा दुस्मान प्रतापसिंह राजा मातीला मिळाल्यामुळे गावोगावच्या चित्पावनांना अमृतसिद्धीचा लाभ झाला. राजाभिषेकाच्या उत्सवात दीपोत्सव नि मेजवान्या करण्यात त्यानी फार मोठ्या उत्साहाने भाग घेतला.
सातार्यापासून अवघ्या ७-८ मैलावर असलेल्या प्रतापसिंहाला, चित्पावनांच्या ब्राम्हण्याची चेष्टा करणारांची काय दशा होते, याचा बाळाजीपंत नातूने आप्पासाहेबाच्या राजाभिषेकान सणसणीत धडा दिला. ‘माझ्या दिवाणगिरीला विरोध केलास? तुझ्या नाकावर टिच्चून पहा झालो का नाही मी सातारच्या छत्रतीचा पेशवा? पेशवा होण्याचे सामर्थ्य जसे माझ्यात आहे, तसे इच्छेच्या केवळ हुंकाराने हव्या त्या दगडधोंड्याला शेन्दूर फासून त्याला छत्रपति बनविण्याचेहि सामर्थ्य माझ्यात आहे.’ आप्पासाहेब भोसल्याच्या राजभिषेकाच्या रसभरीत हकिकती लिंब गावात फैलावण्यासाठी पाठविलेल्या भिक्षुक भटांच्या टोळ्या नातूचे हेच स्वगत विचार प्रतापसिंहाच्या कानावर घालण्याची कामगिरी करीत होत्या. सारांश, आंग्रेजी कृपेच्या पाठिब्यांने नातूने स्वतःचा नि स्वजातियांचा पोटिंबा साखरतुपात घोळवून, प्रतापसिंहाला देशोधडीच्या मातीत लोळविण्याची मसलत यशवंत करून दाखविली.
जन्मठेपीला काशीच कां पसंत केली?
प्रतापसिंहाला मरेतोवर बंदीतच ठेवायचे तर ते कोठे? याच्याहि निश्चित शिफारशी मुंबईसरकारमार्फत कलकत्त्याला पाठविण्याची कारवायी नातूने उरकली होती. नातूच्या घरभेदाने रावबाजी, उखडला गेला असला, तरी नातूच्या या घरभेदापेक्षाहि त्याच्याविरुद्ध प्रतापसिंहाने आंग्रेजांशी केलेल्या खटपटी, चित्पावन समाजाच्या काळजांत शल्याप्रमाणे सलत होत्या. स्वजातिप्रेमात चित्पावन कोणालाहि हार जाणारे नव्हत. आमचा जातभाई पेशवा परागंदा झालानि हा मरगठ्ठा छत्रपति गादीवर टिकला, हे त्याना पहावत नव्हते. प्रतापसिंहाच्या दरोडेबाजपदच्युतीने त्यांचे डोळे गारावले असले, तरी डोळ्यातला खून शमला नव्हता. मरेपर्यंत त्याने अखण्ड अपमानाच्या नि अवहेलनेच्या वेदनातच जगावे, जवळच असलेल्या ब्रम्हावर्ताच्या आमच्या बाजीरावाचे जहागिरदारी स्वतंत्र संस्थान पाहून, आपल्या नजरबंद कैदेने क्षणाक्षणाला त्याचे हृदय करपत जावे, म्हणून काशी हेच प्रतापसिंहाच्या जन्मठेपीचे बंदिस्थान पसंत करण्यात आले.
प्रतापसिंहाची हद्दपारी नि रावबाजीची हद्दपारी यांत जमीन अस्मानाचा भेद होता. कफल्लक अवस्थेत घराबाहेर काढून प्रतापसिंहाला काशी येथे एका मोठ्या वाड्यात नजरकैदेत ठेवला. पण रावबाजीला ब्रम्हावर्ताला भागीरथीचे काठावर औरस चौरस सहा मैल परिघाची जागा देऊन, तेथे नवा राजवाडा, नवीन अनेक मंगल्यांची वसाहत अंग्रेजानी मुद्दाम करून दिलेली होती. शिवायत्याच्या बरोबर बापू गोडबोले लष्करसह, हुजुरातंपैकी पाच पागा, बापू गोखल्याचे हाताखालील रामचंद्र व्यंकटेश व पागा, बापू गोखल्याचे मामा बाळाजीपंत मराठे यांची पागा, बापू गोखल्याचे तैनातीतील भिकाप्पा जगताप यांचीची पागा, ढमढेर्याचे हाताखालील श्रीधर बापू दामले याची पागा, बाळोबा दादा सलकाडे १५० स्वारांसह, शिवाय घोडे, हत्ती, उंट, पालख्या गाखवा, वगैरे लवाजमा ब्रम्हावर्ताला गेलेला होता.
“बाजीरावानी ब्रम्हावर्त येथे एक उत्तम राजवाडा बांधला होता. तो फार भव्य व युरपियन तऱ्हेने भरपूर शृंगारलेला होता. दिवाणखाने मोठमोठ्या आरशानी व झुंबरानी गच्च भरून गेले होते. तसेच भरगच्ची पडदे, रेशमी व जरीचे गालिचे आणि अनेक मौल्यवान चिजा यांचे योगाने पेशवाईचे वैभव तेथे मूर्तिमंत वास करीत आहे, असे दिसत होते. चांदी सोन्याची भांडी, तिचे सोन्यारुप्याचे अलंकार, हौदे, अंबाऱ्या, मेणे, रथ, पालख्या वगैरे पेशवाई दौलत तेथे पूर्ण अस्तित्वात होती. कुत्री, हरणे, काळवीट, वगैरे नाना प्रकारची जनावरे हौसेने पाळलेली दिसत होती. त्यायोगे ब्रम्हावर्त येथे एक नवीनच राजधानी निर्माण होऊन ती राजवैभवाने व जनसमुदायाने प्रफुल्लित दिसत होती.” (मराठी रियासत. उ. वि. ३ पान ५४३-५४४.)
बाजीरावाला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य होते. पुढे काही वर्षांनी रत्नागिरीला आणून ठेवलेल्या ब्रम्हदेशच्या बिया राजासारखा प्रतापसिंह, कुंपणबद्ध अवस्थेत नजरकैदी म्हणून काशीला राणा रायबाजीला सालिना मिळणार आठ लाख रुपये तर या हतभागी छत्रपतीला मिळणार अवधे एक लाख वीस हजार, (दरमहा १० हजार रुपये.) थोड्या मैलांच्या अंतरावर असणार्या या धनी नोकराच्या जीवनाची तुलना, प्रतापसिंहाला अखण्ड अवहेलनेत जाळणारीच असल्यामुळे त्याच्या जन्मठेपीचे बंदिस्थळ काशी ठरविण्यात नातूने आणि कारन्याक गवर्नराने आपल्या खुनसट चतुरायीची कमाल केली, असेच म्हणावे लागते. प्रतापसिंहाला परिवारासह काशीला घेऊन जाण्याचे गवर्नर जनरलने हुकूम वाजवी मार्गाने ले. क्रिस्टलच्या हातात ता. ६ डिसेम्बर १८३९ रोजी पडले. लगेच त्याने दुसर्या दिवशी (ता. ७-१२-१८३९ शनिवारी सकाळी) छावणी उठवण्याचे हुकूम सोडून, तशी तयारी करण्याची महाराजाना आज्ञा केली. तयारी ती कसली करायची? उठा म्हटले का उठायचे, बसा म्हटले तर बसायचे.
रंगो बापूजी बेपत्ता
सातारचा नवाया राजाभिषेक उरकेपर्यन्त रंगो बापूजी मुंबईला होता. त्यावर गुप्त पोलिसांची सारखी टेहळणी मुंबई सरकारने ठेवलेलीच होती. राजाभिषेकाच्या बातम्यानी, म्हणजेच कारन्याक गवर्नरच्या मसलतीच्या झपाटेबंद विजयाने, सेक्रेटरिअट आणि पोलीसखाते आनंदात मग्न असताना, टेहळणीचे काम किंचित ढिले पडले. एका दिवशी रंगोबाच्या बिऱ्हाडी हेर जाऊन चौकशी करतात तो काय! बिऱ्हाडाची जागा रिकामी कागदाचे एक चिठोरेहि तेथे नव्हते.. आजूबाजूला खूप तपास केला, पण कोणीच काही सांगे ना. त्याच्या गाठीभेटीच्या अनेक गृहस्थांकडे चौकशा केल्या. पत्ता नाही. मुंबईचे पोलीस मॅजिस्ट्रेट मि. इलियट हे डॉ. मिलनच्या भेटीला गेले. `रंगो बापूजी मावळांत घरी जातो, असे सांगून पंधरवड्यापूर्वीच निघून गेला` असे त्यानी सांगितले, झाले. पुणे सातारा मावळात गुप्त पोलीसांची तांगड लागली. लिंब गावातहि हेर येऊन गेले. अशा तपशिलाचा कोणीहि असामी इकडे आल्याचे आमच्या रोजनोंदीत आढळत नाही, असे क्रिस्टालने सांगितले.
लिंबाला अनक भीकमाग्ये भिक्षुक, संन्यासी, गोसावी, कावडीवाले येत असत. हे लोक छत्रपरीच्या दर्शनाला गेले, तर त्यांच्या झोळीत टाकायला त्याच्यापाशी मूठभर तांदूळ अथवा तांब्याचा छत्रपतीहि नसल्यामुळे, त्याची चांगलीच जिरणार, या खुनशी हेतूने क्रिस्टाल असल्या भिकार्याना मुदाम महाराजाकडे जाण्याची परवानगी देत असे. गोसावी संन्याशी भेटले का प्रतापसिंह डोळ्यात आसवे आणून त्यांच्या पायावर डोके ठेवायचा आणि तो देखावा पाहून पाषाणादी क्रिस्टल मिस्किलपणाने हसायचा. या भिकाऱ्यांच्या टोळीतच एक धन्नकधारी कावडीवाला महाराजाना भेटायला आला.
तो बराच वेळ महाराजापुढे पोथी उघडून वाचीत बसला आणि महाराजहि एकाग्र चित्ताने काही `वेदान्तशास्त्र` त्याच्याशी बोलत बसले होते. काम झाल्यावर तो क्रिस्टालसाहेबालाहि हात दर करून `साहबको बढ़ती मिले गा’ असा तोंडभर आशीर्वाद देऊन पसार झाला. याचकानी ताडले का कोण होता तो? धन्नकधारी सीतारामच्या गर्जना करीत, लाल कापडाची कावड घेऊन, ऐटीत येऊन सफाईत निघून जाणारा तो कावडचा महणजेच रंगो बापूजी सातारच्या किल्ल्यावर जाऊन महाराजांचा भेद काढताना ज्याने काशीपंत बोंदऱ्यासारख्या जमदग्नीला चकवायला सोडले नाही, तो या टोपडचा क्रिस्टलला आणि शिकारी कुतर्याप्रमाणे दख्खनभर फैलावलेल्या गुप्त पोलिसाना काय दाद देणार!
वनवासाला सुरुवात
तब्बल ९३ दिवस लिंबाचा मुकाम झाल्यावर ता. ७-१२-१८३९ शनिवारी सकाळी क्रिस्टालने छावणी उठवून, पायरस्त्याने प्रयाण चालू केले. महाराज २ राण्या, राजकन्या गोजराबाई, बाळासाहेब सेनापति इत्यादि राजवंशी मंडळीना मेणे, बाकीच्याना बैलांच्या गाड्या, इतर शेकडो लोक पायी चाललेले. शिवाय राहुल्या, तंबू मुदपाकखान्याचे सामान, यांच्या गावा अशा लटांबराची ही वनवासयात्रा. सकाळी निघायचे नि रात्रीला कोठेतरी मुक्काम करायचा, अशा नियमाने चालू झाली. नाशिक पंचवटीच्या हद्दीत ही वनवास यात्रा छावणीला असताना, एकदम सातारचे काही अधिकारी आले नि त्यानी बळवंतराव भोसले सेनापति याजवर ५० हजार रुपये वसुलीचा जप्तीहुकूम लागू केला. हदपार झाल्यानंतर किंवा केल्यानंतर, राजधानीतल्या सैन्याच्या हिशेबाचा तपशील द्यायचा कसा नि फेड तरी कशी कोठून करायची? तिजोरी, हिशोब नि कारकून राहिले सातार्याला आणि ५० हजार तसलमातीच्या उघराणीची मागणी वनवासात! अंग्रेजी कायदा म्हणजे रानडुकराची मुसंडी परिस्थिति किंवा व्यक्तीचा मुलाजा तो मानीत नाही. बळवंतरावने आपल्या बायकोला लंकेची पार्वति करून होते नव्हते से दागदागिने जप्ती-कारकुनापुढे ठेवले.
त्याने आपल्या बरोबर सातारचा एक कुप्रसिद्ध नि नाठाळ बामण सराफ मुद्दाम आणला होता. त्याने त्या दागदागिन्यांची किंमत बाजारभावापेक्षा ५० टक्के कमी ठरविली. बाकी रकमेसाठी आता जंगलात करावयाचे काय? अखेर बाळासाहेबाने ‘माझी सातारची असेल नसेल त्या घर जमिनीची जप्ती लिलाव करून फेड करून घ्या,` असे लिहून दिल्यावर ओवान्स-नातूच्या त्या सातारी राहू केतूंचा वेध सुटला. बाळासाहेबाला नुसता भिकारी करूनच नातू ओवान्सचा खुनशीपणा थंडावला नाही. अखेर त्या बिचार्याचा त्यानी खूनच पाडला. कसा, ते पुढे योग्य ठिकाणी सांगण्यात येईल. वनवासातला हा पहिला फटका.
ता. १२ जानेवारी १८४० सोमवारी सकाळी बाळासाहेब सेनापतीच्या गरोदर पत्नीच्या पोटांत दुखू लागले. आजचा मुकाम येथेच खानदेशात सांगवी येथे थांबवावा, म्हणून महाराजानी नि सेनापतीनी क्रिस्टालची विनवणी केली. `मी फक्त दोन घटका थांबन, तेवढ्यात काय उरकून घ्यायचे असेल ते घ्या’, पुढे नाही थांबणार असे त्या गोर्या मांगाने उत्तर दिले. बाळंत होणे हे कोणाच्या हुकमतीवर नसते! अखेर ती बाई वेदनानी व्याकूळ होऊन मेण्यातून उतरली नि रस्त्याच्या कडेला झुडपाआड जाऊन बसली. ‘मला इथे मरू द्या. तुम्ही जा सारे पुढे’ असे तिने म्हटल्यावरून यात्रा थांबली. त्याच झुडपाच्या आडोशाला ती बिचारी बाळंत झाली. मुलगा झाला. काही बरोबरीच्या कुणबिणीनी झाडपाल्याची औषधे दिली, ओढ्यातले पाणी आणून धू पूस केली. काही गावकरी जमले होते. त्यानी दुधापेजेची वयवस्था केली आणि मग बाईला मेण्यात बसवून यात्रा पुढे चालू झाली. साध्यासुध्या गरीब संसारी माणसावर असा प्रसंग आला तर काय ब्रम्हांड आठवले ही तर जन्मापासून राजविलासात लोळणारी मंडळी. तेव्हा त्यांच्या भावनांच्या कर्कशा चिंधड्या उडाल्या असतील. याचे वर्णन निष्णात कविजनानी किंवा कादंबरीकारांनीच करावे. ज्याचा जन्म राजवाड्यात व्हायचा, जन्म होताच तोफांची घडेबाजी व्हायची, हत्तीवरून साखरा वाटल्या जायच्या, तो हतभागी जीव रस्त्याच्या धुळीत झुडपाआड जन्माला आला, म्हणून त्याचे नाव `जंगली महाराज’ ऊर्फ त्रिंबकजी असे ठेवले.
येतील त्या संकटाना धैर्याने तोंड देण्याची प्रतापसिंहाच्या मनाची तयारी होतीच. पण बाळासाहेबासारख्या जातिवंत मानी शिपायीगड्याला या प्रसंगाने अतिशय दुःख झाले. तो मनातल्या मनात झुरू लागला. तशात त्याला कदन्नामुळे आमांशाचा विकार जडला. गावोगाव कोणी काय सांगेल ते झाडपाल्याचे औषध घ्यायचे नि मेण्यात पडून रहायचे. आमांशासारखा प्राणांतिक घाणेरडा रोग दुसरा नाही. महूनजिक जाताना ‘सेनापतीची अवस्था बिकट आहे, मुक्काम कराल तर औषधपाण्याची व्यवस्था लावता येईल’, अशी पुन्हा क्रिस्टालची महाराजानी विनवणी केली. पण त्याने काहीहि न ऐकता प्रवास सारखा चालू ठेवला. महूनजिक तिकुराई येथे मेण्याचे भोई तक्रार करू लागले की मेण्यात घाण फार येते. तेव्हा क्रिस्टाल गेला नि पहातो. तो बाळासाहेब भोसले सेनापतीचे प्रेत आत कुझुन त्याला घाण येत होती!
यापुढच्या आकांताचे वर्णनहि मी एकाद्या कवि कादंबरीकाराच्या कलमबहादरीवरच सोपवतो. पंधरा दिवसापूर्वी पुत्रजन्म होतो काय आणि आज (ता. २७ जानेवारी १८४० सोमवारी) जन्माचे निधान, आपला शूरवीर पति, औषधपाण्याशिवाय तडफडत मरण पावतो काय! कोणी त्या बाईच्या शोकाला आवरावे? कोणी त्या निरपराध माउलीचे डोळे पुसावे? सेनापतीचे वय अवघे ४९ वर्षांचे होते. बाप चतुरसिंग भोसले अलपिष्टनाच्या हेकेखोरपणाने आणि रावबाजी नि त्रिंबकजी डेंगळ्याच्या विश्वासघाताने कांगोरीच्या किल्ल्यावर खितपतून मरण पावला. त्याचा सुपुत्र बाळासाहेब वनवासात हालअपेष्टा होऊन देवाधीन झाला. प्रतापसिंहाला वनवासात पाठविणारे रॉबर्ट ग्रांट-नातू-ओवान्स-कारन्याक ही मंडळी एकपट चाण्डाळ, तर क्रिस्टाल होता दसपट खुनसट नि तिरसट. लहान थोर कोणाहि हिंदी आदमीचा छळ करण्यातच क्रिस्तानंद मानणारे जे शेकडो गोरे चाण्डाल विलायतेहून इकडे आले होते. त्यांतलाच क्रिस्टाल हा एक अर्कट नमुना होता.
अशा रीतीने ६ महिने आणि २१ दिवसांच्या वनवासाचे अनंत छळ, जिवलगांचे मृत्यू आणि अवहेलनेचे अगणित प्रसंग भोगून, ता. २५ मार्च १८४० बुधवार रोजी, प्रतापसिंहाला सपरिवार काशी येथे सरकारने भाडयाने घेतलेल्या एका प्रशस्त म्हणजे आवाराने मोठ्या अशा वाडयात आणून गुदरले. क्रिस्टालने आपला चार्ज कारपेण्टर नावाच्या एका इंग्रज गृहस्थाच्या स्वाधीन करून तो आपले काळे तोंड घेऊन निघून गेला. वाचकहो, या वनवासाच्या अमानुष त्रासाने तुमचीहि मनःस्थिति बिघडली असेल, असे मलवाटते, तेव्हा, आता आपण या मंडळीना येथेच सोडून जरा विलायतचा थंडगार प्रवास करून येऊ या. अहो लंडन म्हणजे न्यायाचे माहेरघर. त्या भूमीवर पाऊल ठेवणाराच्या गुलामगिरीच्या शृंखला म्हणे खळाळ तुटून पडतात नि तो माणूस अगदी हवेसारखा स्वतंत्र होतो! त्या न्यायभूमीत अन्यायाला थाराच नाही! जगात कोठे अन्याय झाला तर त्याचे निराकरण या लंडनला होते. असे तेथले लोक मोठे सत्याभिमानी नि ईश्वरावतार आहेत! चला तर मग तिकडे आणि पाहू या आमचे यशवंतराव शिर्के, भगवंतराव चिटणीस नि चिटकोजीराव सुर्वे यांनी आतापर्यंत काय काय कामगिरी केली ती. काय म्हणता? ‘‘इंग्रेजी राज्यात न्याय राहिला नाही’’ हे प्रतापसिंहाचे वाक्य तुमच्या कानात घुणघुणत आहे? मग तेच सत्य पडताळून पाहू म्हणजे झाले.
विलायतेचा मामला, पैशाशिवाय बोंबला
सर चार्लस फोर्ब्स प्रभृतिचार दोन इंग्रज सज्जनांच्या देखरेखीखाली एक मोठा मुद्देसूद अर्ज तयार करून, यशवंतराव, भगवंतराव आणि सुर्वे जामानिमा करून, सपटेंबर १८३९ त. म्हणजे इकडे प्रतापसिंहाला पदच्युत केले त्याच सुमारास डायरेक्टरांच्या कोर्टात अधिकार्यांच्या भेटीला गेले. गोरे लोक अव्वल दर्जाचे सभ्य नि न्यायी, अशी त्या भोळ्यांची समजूत, पण अनुभव अगदी उलटा आला. कारण, कामचलाऊ गवर्नर फेरीस याने या हिंदू वकिलाना मान्यता देऊ नये, असा पत्रमंत्र आधीच कोर्टाच्या कानात फुंकून ठेवलेला होता. ही मंडळी कोर्टात गेली तो त्यांना तेथे कोणी आधी विचारीच ना. दुभाष्याला पुढे करून जेमतेम तेथल्या सेक्रेटरीची गाठ घेतली. या बसा, कोठून आला, वगैरे मामुली सभ्यपणाहि न दाखवता, त्याने या वकिलांना, त्यांचा अर्ज हातात न घेता, धुडकाऊन लावले. आम्ही तुम्हाला ओळखत नाही, असे सांगितल्यावर उरलेच काय? नंतर सर फोर्ब्सच्या सूचनेवरून यशवंतरावने भलीमोठी रकम देऊन एक गोरा बालिस्टर केला आणि त्यांच्या मार्फत तो अर्ज कोर्टाच्या दरबारात गुजरला.
कामाचा श्रीगणेशा झाला म्हणून यशवंतराव सुस्कारा सोडतो न सोडतो तोच लंडनच्या सार्या छाप्यांत (वर्तमानपत्रांत) प्रतापसिंहाच्या पदच्युत्तीची आप्पासाहेब भोसल्याच्या राजाभिषेकाची आणि महाराजाना काशीला नेऊन ठेवल्याची बातमी मोठमोठ्या अक्षरात झळकली. यशवंतरावाची कंबरच खचली. खुद्द धन्याचेच उच्चाटन झाल्यामुळे या परदेशस्थ वकिलांचा सारा आधारच तुटला. मुख्य प्रश्न पैशाचा. तो आता येणार कोठून नि कसा? यशवंतरावची विवंचना त्याच्या डायरीतच त्याने लिहिली आहे, तीच आता पाहू-
"असे वर्तमान कलल्यावरून चितास चैन पडेना की आधी विलायतेस कोणी येणे न होईना याबद्दल महाराज सरकार फार खराबीत आले. त्यातून ईश्वरे ही गोष्ट घडविली. अता येथे पैशाचे काम, आम्हाजवळ तर पैसा थोडा वेलेस रवानगी जाहली ते वेलेस निघोन विलायतेस जाऊन पोहचू असा भरवसा सरकारास नहुता. सबब खर्चास वाटबेगमी पुरते आणि सहा च्यार महिन्याचे जाजती दिल्हे आणि तुम्ही तेथे पोचल्यावर मागाहून पाठवून देईल म्हणोन समक्ष सांगितले. त्याप्रमाणे मागाहून यावयाचे तो असे जाहले. तेव्हा आता विच्यार काय? महाराज गुंते गेले व जवलचा पैसा सरत आला. या मुलकात पैसा पुस्कल आसोन आम्हास कोण उगीच देतो? म्हणोन वगैरे पुस्कल विच्यार ध्यानात येऊन चैन पडे ना. नंतर त्या विच्यारातच तेथील दोस्ती जाहलेले लोकाकडे जाऊन येविसीचे आता पुढे कसे करावे म्हणोन विध्यारिले. तेव्हा त्याची सला पडो लागली की इकडील काम पैशाचे असता तुम्हाजवळ पैसा तुमचे पोटखर्चासच नाही. भाड्याचे घरात आहा त्याचे भाड्यास दरमहा रुपये ३९२ द्यावे लागतात. व दुभाशी जाहाजात नवा किरिस्ताव याचा दरमहा व मुंबईचा प्रथम बरोबर आणिलेला त्याचा येकूण रु. २०० व कप्तान जवल माहितगारीस वगैरेस उस्तवारी गोरा लोक ठेविला त्याचे रुपये २५० व सिवाय घरजागा साफ करण्यास दरमहा रु. ४५ याचे माणूस आणि गाडीखर्च रोज रु. १५ व कागद व लिहिणार इंग्रजी येथून येकंदर मिळोन पंधराशे रुपये दरमहा, हाच बाहेरचा खर्च व सिवाय या माहागाईचे देशात तुम्हा इतक्या हेंदू माणसास भोजनखर्च व वगैरे खर्च आणि कपडे. असा सर्व खर्च तीन हाजारावर जाईल. हा निभतो कसा, याज करिता अता दुसरा विच्यार काही एक नाही. तुम्ही आला तसे परत आपल्या देशात जावे. या प्रमाणे बहुतेकाची सला पडली.”
तथापि, स्वदेशी परत जाण्यापूर्वी काहीतरी कागदपत्री धडपड करून मग जावे, असे शिर्के मंडळीनी ठरविले. पण आज विसाव्या शतकाच्या आंतर्राष्ट्रीय जागृतीच्या काळात, कागदी घोड्यांना विलायत सरकार सहज लीलेने गिळून बेपत्ता पचवीत आहे, तर शंभर वर्षापूर्वी शिर्के प्रभृतीच्या अर्जाच्या भेंडोळ्यांना तिकडे कोण धूप घालणार? शिवाय शिर्क्याला इंग्रजीचा गंध नाही. स्वभाव शंकेखोर, खर्चाला चिकट आणि सारी खटपट तर केली पाहिजे इंग्रजी दुभाष्यांच्या हाता तोंडानी. जवळचा पैसा संपत आल्यामुळेबिचारा अगदी मॅड होण्याच्या पंथाला लागला.
प्रकरण २३ वे
जातिवंत इंग्रेज गृहस्थ खवळले
शिर्के चिटणीस सुर्वे मंडळीना बनिया कंपनीच्या लंडनकर अधिकान्यानी प्रतापसिंहाचे वकील म्हणून मान्यता न देता, त्याना नि त्यांच्या अर्जाना धुडकाऊन लावले, तरी ही वकील मंडळी स्वस्थ बसली नाहीत. सर चार्लस फोर्स प्रमृति जातिवंत इंग्रेज गृहस्थांच्या सल्ल्याने, महाराजावरील अन्यायांच्या माहितीची आणि अर्जांच्या तपशिलांची माहिती वृतपत्रात छापून त्यानी तेथल्या लोकमत जागृतीचे काम नेटाने चालविलेच होते. इकडच्यापेक्षा लंडनमध्ये वृत्तपत्रांचे महत्व आणि प्रसार या सुमारास बराच झालेला होता आणि सकाळच्या न्याहारी इतकीच इंग्लिश लोकाना बातम्यांची चटक लागलेली होती. या वृत्तपत्रांचाहि शिर्के मंडळीनी पुष्कळ उपयोग करून घेतला होता. पण सारे काम छणछणीत दक्षणेचे होते.
प्रतापसिंहाच्या पदच्युतीची नि लगोलग हदपारीची बातमी इंग्रेजी वर्तमान पत्रांत ठळक ठशानी जाहीर होताच, सबंध इंग्लंडभर आश्चर्याचा धक्काच बसला. हिंदुस्थानात नोकर्या करून सेवानिवृत्त झालेल्या, अथवा व्यापारी पेढ्यांचे व्यवहार करणान्या शेकडो सभ्य इंग्रेज स्त्री पुरुषाना तर या बातमीने चीड नि संताप आला. या पूर्वी अनेक वेळा प्रतापसिंहाच्या उमद्या स्वभावाची त्याच्या प्रागतिक मतांची राज्यकर्तृत्वाची आणि डायरेक्टर कोर्टाने स्याला अभिनंदनार्थ पाठविलेल्या रत्नजडित तलवारीची माहिती तेथल्या वतृमान पत्रांत आलेली असल्यामुळे असल्या थोर राजघराण्यातल्या उमद्या राजाला एकदम पदच्युत ति हद्दपार करण्यासारखे झाले तरी काय, याचेच लोकाना मोठे कोडे पडले. शिर्के वकील मंडळ लंडनला ठाण मांडून बसल्यापासून, कंपनीच्या मुंबईकर कारभान्यानी सातार्याच्या सज्जन राजावर कसकशी घाशीरामी चालविलेली होती, याची लंडनकर जनतेला कल्पना आलेली होती.
सर जेम्स कारन्याक तिकडे गेला आहे. प्रतापसिंहाशी दोस्तीने वागून त्याच्या तक्रारींचे नि तेथल्या रसिदंटादि कारभान्यांच्या कुरकुरींचे परिमार्जन करण्याचे हुकुम त्याला दिलेले आहेत, तेव्हा `आता सब कुछ ठीक हो जायेगा’, अशा भ्रमात कंपनीचे बडे अधिकारी असतानाच, सातारा प्रकरण एकदम उतास जाऊन त्याचा स्फोटहि उडाल्याच्या बातमीने, तेहि आश्चर्यचकित झाले. निकट परिचयाने प्रतापसिंहाला पुरेपूर ओळखणारे जुने रसिदंट ग्रांटडफ, कर्नल ब्रिग्ज, कर्नल रॉबर्टसन आणि राजावरील गंडांतराचा दुर्दैवी श्रीगणेशा काढणारा लाडविकहि या वेळी लंडनातच होते. प्रतापसिंहावर लादलेले आरोप सपशेल खोटे आहेत, त्याला हाणून पाडण्यासाठी खटपट करणान्या नातूपक्षाच्या कोकणस्थ भटांचीच ही काहीतरी दुष्ट कारवायी असली पाहिजे आणि तिला मुंबईच्या हिंदद्वेष्ट्या नि लाचखाऊ कारभाऱ्यांची साथ नि फूलच असली पाहिजे असा बिनचूक कयास या मंडळीनी केला. ते सारे शिर्के मंडळीना येऊन भेटले. सर चार्लस फोर्ब्सनि कंबर बांधली. कंपनीचे काही प्रोप्रायटर लोकहि त्याना सामील झाले.
सत्तेच्या जोरावर हिंदुस्थानात हिंदी लोकांना कस्पटासमान वागवणारे बरेच आंग्रेज नराधम असले आणि डायरेक्टर कोर्ट, प्रोप्रायटरांचा बोर्ड आणि कंट्रोल बोर्ड या तीन वरिष्ट कचेर्यातून स्वार्थापुढे परमेश्वरालाहि न जुमानणारे कित्येक खिसेभरू गोरे बनिये असले, तरी न्याय नीति मानणारे मानुसकीला पारखे न झालेले अनेक सज्जन कंपनीच्या कारभारात होतेच. त्यापैकी सर चार्लस फोर्ब्स, जे. लुईस, चार्लस ग्रांट, रॉबर्ट जोन्स, हेन्री डॉक्सिन, सॅम्युअल मॅकमोरील एडवर्ड एम. बेलासिस जेम्स के फोर्मा आणि जेम्स मालकमसन या प्रोप्रायटरानी, सर रिचर्ड जॉकिन्स जी. सी. बी. एम. पी. जनरल कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्सचे चेअरमन यांनाता. ४ फेबवारी १८४० रोजी नोटीस पाठविली. सातारा राजावरील पदच्युती नि हदपारी, जनरल कोर्टाची चौकशी होईपर्यन्त ताबडतोब तहकूब करण्याचे हुकूम मुंबई कलकत्ता सरकाराना पाठविण्यात यावे, यासाठी तातडीची सभा बोलावण्याची आग्रहाची विनंती केली.
ता. १२-१३ फेब्रुवारी १८४० गुरुवार शुक्रवार रोजी ईस्ट इंडिया हाऊसमध्ये ही सभा भरली. झाडून सारे प्रोप्रायटर लोक आणि डायरेक्टर्स हजर होते. अध्यक्षस्थानी सर रिचर्ड जेकिन्स होते. "साताराचा सज्जन नि लोकप्रिय राजा एका दुष्ट नि असंभवनीय कटबाजीला बळी पडला आहे. त्याच्या गादीवर बसलेला त्याचा नालायक भाऊ या कटाचा म्होरक्या आहे आणि दिवाणगिरी दिली नाही म्हणून प्रतापसिंहाच्या नावाने खडे फोडणारा,उलट्या काळजाचा कंपनीचा एक देशी नोकर (बाळाजीपंत नातू) या कटाचा मुख्य चिथावणीखोर सूत्रधार आहे. हा एक मोठा अन्याय होत आहे आणि तो भी अव्वल दर्जाच्या कागदपत्रांवरून सिद्ध करणार आहे. माझा पुरावा निर्भेळ सत्यावर आधारलेला असल्यामुळे, सत्य प्रगट करताना मी कोणाहि थोरामोठ्या अधिकाऱ्याची पर्वा करणार नाही" अशा शब्दांनी सर चार्लस फोर्ब्स यानी वादाला तोंड फोडले.
एकेक मुद्दा घेऊन, दस्तऐवजी पुराव्यांच्या आधाराने सर फोर्ब्सनी मयत ग्रांट गवर्नर, ओवान्स, मुंबईचे फेरीस विलोबी आणि नातू याच्या कारस्थानांचा असा काही धुव्वा उडवून दिला का सारे प्रोप्रायटर्स नि डायरेक्टर्स शरमेने खाली माना घालून बसले. फोर्ब्सनंतर लुईस नि जनरल लाडविक यांची दणदणाटी भाषणे झाली. लाडविकने गवर्नर ग्रांटची कृष्ण कारस्थाने उघड करून, त्याने नेमलेल्या विलोबी ओवान्सच्या गुप्त कमिशनच्या एकतर्फी नि बेकायदेशीर पुराव्यांचे हलकट भांडवल चव्हाट्यावर मांडले. राजाचा पदोपदी अपमान करण्याचा ग्रांट गवर्नरने कसकसा यत्न केला. रसिदंट ओवान्स आणि नातूने त्याला कसकशा कुटिल बुद्धीच्या चिथावण्या दिल्या आणि अखेर स्वतालाहि सातार्यातून हाकलून देण्यासाठी सर ग्रांटने ‘माझीहि असभ्य विटंबना केली.’ यावर लाडकिने सात्विक संतापाने तब्बल एक तास भाष्य केले. कर्नल रॉबर्टसन याने आपले भाषण लिहूनच आणले होते. त्याने नातू आणि चिंतामणराव सांगलीकर यानी चिथावलेल्या ब्राम्हणांच्या धिंगाण्यांची माहिती देऊन, प्रतापसिंहाविरुद्ध आणलेल्या अनैतिक आरोपांचे कमाल तिटकार्याने खंडण केले. कॅपटन कोगनने दुसऱ्या दिवशी आपल्यावर मुंबईच्या सरकारी घाशीरामानी केलेल्या आरोपांचे कागदोपत्री पुराव्याने निराकरण करून ‘हे तुमचे मुंबई सरकारवाले अधिकारी इंग्रेजी संस्कृतीची नि सभ्यतेच्या साध्यासुध्या वागणुकीची बदनामी करणारे दुष्ट लोक आहेत.’ असा सरळ आरोप केला.
कर्नल ब्रिग्जनेहि प्रतापसिंहाच्या सात्विक जीवनाची, त्याच्या लोकप्रियतेची आणि धार्मिक बाबतीत चित्पावन भटांच्या त्याच्यावरच्या कडव्या रोषाची खास परिचयाची माहिती देऊन प्रतापसिंहावर आणलेले सारे आरोप खरे मानायला माझी सद्सद्विवेक बुद्धि स्पष्ट नकार देत आहेअसे सांगितले. ही दोन दिवसांची प्रोप्रायटरांच्या जनरल कोर्टाची सभा अतिशय दणदणाटाची झाली. विरोधी पक्षाच्या भाषकांना तर फोर्ब्स प्रभृति मंडळीनी जागच्या जागी ठाकठीक जबाब देऊन चीं चीं करीत बसायला लावले. या सभांतील संपूर्ण शब्दशः भाषणांचे डेमी अष्टपत्री साच्याचे २५४ पानांचे एक स्वतंत्र पुस्तकच १८ चार्लस स्ट्रीट, बर्नर्स स्ट्रीट, लंडनच्या मि. जॉन विल्सनने प्रसिद्ध केले होते. त्याच्या हजारो प्रति त्यावेळी लंडनला भडाभड विकल्या गेल्या.
वास्तवीक या एकाच बैठकीत प्रतापसिंहाची बाजू त्याच्या स्वतंत्र चौकशीचा आग्रह, आरोपांचे मुद्यापुराव्यानिशी निराकरण करण्याची त्याची सिद्धता, याविषयी जागच्या जागी अखेरचा निकाल लागणे क्रमप्राप्त होते. पण सगळेच प्रोप्रायटर्स काही सत्याचे नि न्यायाचे अभिमानी नव्हते. हिंदुस्थानात तागडीची तरवार करून हे गोरे बनिये तेथे ‘सरकारपणा’ गाजवीत असले, तरी पिण्डाने सारे बनियेच! बनियाला काळीज नसते म्हणतात. भिक्षुकशाहीचाहि पिण्ड असाच फत्तरी काळजाचा असतो म्हणूनच भटाबामणांच्या नि वाणी बनियांच्या हातात राजकारण गेले का राजरोस दरोडखोरीला संभावीतपणाचा कायदेशीर शेन्दूर फासला जातो. पेशवाईने नि आंग्लाईने हे सत्यचांगलेच सिद्ध करून दाखविले नाही का? अखेर पदच्युति तहकुबीचा ठराव बहुमताने फेटाळला गेला. "इंग्रेजी राज्यात न्याय राहिला नाही." हा प्रतापसिंहाचा सिद्धांत लंडनवासी फोर्ब्स,ब्रिग्ज, लाडविक, रॉबर्टसन प्रभृति इंग्रेजानाहि पत्करावा लागला. आधीच निर्धन होत चाललेल्या शिर्के मंडळीना तर या सत्यशोधनाच्या आंग्रेजी फार्साने भलताच धक्का बसला.
‘`भीक मागून पोट भरा`’
महाराज काशीला जाऊन पोहचल्याचे समजल्यावर यशवंतराव शिर्क्याने पैशाच्या अडचणीबद्दल त्याना पत्र पाठविले होते. त्याचे उत्तर आले की "आम्हाजवळ पैसा नाही तेव्हा तुम्हास काय पाठवावे? आमची सर्व दौलत व खासगी जिनगीसुद्धा गेली. येके वस्त्रानी बाहेर निघालो. फार आमचीच आडचण. खर्चास दरमहा देतात तो पुरत नाही. तुम्ही तिकडे भीक मागून पोट भरा आणि सरकारी काम करा. तुमचे वडील असेच कामी आले.’’ शिर्क्याची निराशा काय सांगावी! तो कपाळाला हात लावून बसला. सरंजामी थाटाने रहाणान्या नि पैशाचा पुरवठा बंद पडताच हातपाय गाळणार्या माणसांसाठी विलायतचा मामला आजहि नाही, मग त्या वेळी कोठून असणार?
युक्तिप्रयुक्तीने तेथल्या ओळखी झालेल्या मित्रांकडून कर्जवाम करावे तर तसे करताना आब जातो. शिवाय कर्ज मिळालेच तर ते फेडण्याची त्या परदेशात सोय काय? बिचारा अगदी वैतागून गेला. तशात महाराजाचे १० हजार रुपये घेऊन लंडनला येऊन बसलेला तो सयद गीर आफलज अल्ली। तोहि सार्या पैशाची वाट लावून शिर्क्याच्या बिर्हाडि सकाळच्या किंवा संध्याकाळच्या जेवणाला टिपला हजर, बेट्याने काम तर काहीच केले नाही. एकदा तो चारपाच डायरेक्टराना भेटला. त्यानी सांगितले की आता जेम्स कारन्याक साहेब मुंबईला गवर्नर जाताहेत, ते तुमच्या राजाच्या भानगडी सहानुभूतीने मिटवतील, तुम्ही स्वस्थ रहा. म्हणून हा लेकाचा बसला लंडनात महाराजांच्या पैशावर चैन करीत.
शिर्के अशा चिंतेत व्यग्र असतानाच त्याच्या हातात रंगो बापूजीचे पत्र पडले. हज़ार प्रेत्ने आरबस्तान मसकतच्या वाटेने येथवर सुखरूप येऊन, जवळ रोकड़ा पैका नाही. सबब मालटा येथे करांटीत अडकून पडलो आहे. पैसा पाठवा म्हणजे लंडनला येतो. हा त्यात मजकूर रंगो बापूजी कधिकाळी विलायतेला येईल, किंवा महाराज त्याची रवानगी करतील, अशी शिर्क्याची कल्पनाच नव्हती. तशात हा प्राणी जवळ पैसा नसता, भलत्याच मार्गाने येतो काय नि परमुलुखाच्या करांटीत (क्वारंटाईनमध्यें) अडकून पडतो काय!
आमच्या जवळ तर विष खायला दिडकी नाही. यशवंतराव आधीच चिरचिन्या नि तशात हा नसता प्रसंग! अखेर भगवंतराव नि चिटकोजी सुर्व्याने तोड काढली. त्या वेळी कॅपटन कोगन लंडनातच होता. तिघे त्याला भेटले. रंगोबाचे पत्र पाहताच, मालटांपर्यन्त आला ना रंगोबा? खूप मजल गाठली. शाबास, `पुढचे मी आता पाहून घेतो.` असे आश्वासन कोगनने दिले आणि तात्काळ मालट्याला पैसे पाठविण्याची तरतूद केली. यशवंतराव आपल्या डायरीत लिहितो. ता. ३० जून सन १८४० आषाढ शु. १ मंगळवार शके १७६२ रोजी रंगो बापूजी लंडनला येऊन दाखल झाला. त्याच्या बरोबर सिशा (शिष्य म्हणजे सेवक) रावजी बापाजी, गडी विठू कुडला व सख्या पोरगा, असे आणखी तिघेजण होते.
(ता. १६ एप्रिल १९२४ च्या प्रयोजनात रंगो बापूजीचे संक्षिप्त चरित्र देताना, मी या मुद्यावर एक टीप दिली होती. ती अशी- "यशवंतराव शिर्क्याच्या स्मरणवहीवरून असे दिसते की रंगो बापूजी व पुरेसा ऐसा नसताहि लंडनच्या सफरीला निघाला. कारण तो माल्टा येथे उतरून पैशाच्या अडचणीत अडकला होता. त्याने यशवंतरावाला लंडनास पत्र पाठवून पैसे मागितले व ते हाती आल्यावर तो लंडनला गेला. मुंबईकरांच्या सिऐडीला बेमालूम गुंगारा देऊन, त्याने मुंबई ते लंडनचा प्रवास मस्कत आरबस्तानातून पायवाटेने केला भूमध्य समुद्रातल्या कोठल्या तरी अज्ञात बंदरावर एक जहाज गाठून तो पुढे गेला आणि माल्टा येथे क्वारंटाईनमध्ये अडकला.")
मेजर बी. डी. बसू यानी आपल्या स्टोरी ऑफ सातारा ग्रंथात रंगो बापूजी ता. १२ सप्टेंबर १८३९ रोजी मुंबईहून जहाजात बसून निघाला, तो १८३९ सालच्या अखेरीला लंडनला पोहोचला, असे जे लिहिले आहे. ते सपशेल चूक आहे. यशवंतराव शिर्क्याने आपल्या डायरीत जी तारीख तिथि दिलेली आहे. तीच रंगोबाने आपल्या २ जुलै १८४० च्या महाराजाना लिहिलेल्या पत्रात (पहा पेशवे दप्तर भाग ४२ पान १०८) ‘ता. ३० जून आषाढ शु. १ मंगलवारी प्रातः काली पावलो.’ अशी स्पष्ट दिलेली आहे. अर्थात मेजर बसूचे विधान केवळ अनुमान धपक्याचे ठरते. रंगी बापूजीच्या गुप्त प्रयाणाला कॅपटन कोगनची योजना सहायकारी झाली, हा संदर्भ सन १९२४ सालानंतर मला हस्तगत झाला.
गुप्त प्रयाणापूर्वी
मुंबईला असताना रंगो बापूजीने ता. २ सप्टेंबर १८३९ ला महाराजाना पैशाच्या सोयीबद्दल पत्र पाठविले. त्याने कॅपटन कोगनला दरमहा पगारावर नेमला. दरमहा रुपये २००० पगारावर लंडनमध्ये जाऊन कोर्ट दरबारची कामे त्याने पहावी, असे ठरले होते. शिवाय त्याने एक वर्षाचा २४००० रुपये पगार आगाऊ मागितला. तेव्हा एकंदर निदान ५०००० रुपयांची तरी सोय व्हावी अशी रंगोबाची मागणी होती. त्याला महाराजांचे ता. ४ चे (पदच्युतीच्या दिवशीचे) उत्तर गेले की, "इकडील एकंदर परिस्थिति पहाता, यामुळे तुम्हाला किंवा लंडनला गेलेल्या मंडळीना पैसा पुरविता येईल असा भरवसा राहिला नाही. तसे त्या मंडळीना तुम्ही स्पष्ट कळवावे. किंवा हे पत्रच त्यांना दाखवावे. पूर्वी दिलेले २५ हजार रुपये तुमचेपाशी असतीलच, आज आणखी २५ हजारांची हुंडी पाठवीत आहे. या रकमेत तुमचा विलायत प्रवास वगैरे सगळ्या भानगडी भागवून घ्याव्या. माझा आता नाईलाज झाला आहे.’’ पूर्वीच्या २५ हजारांची मुंबईला अर्धीमुर्धी वाट लागलेलीच होती. कॅपटन कोगनचे रोख २४ हजार गेल्यावर, लंडन गाठायला रंगोबाच्या हातात काय उरले असेल, याची आपल्याला सहज कल्पना होते.
रंगो बापूजी कसा निसटला?
छत्रपतीचा वकील म्हणून लंडनला जाण्याचा गाजावाजा केला असता, तर मुंबई सरकारने रंगोबाला हव्या त्या सबबीखाली डांबूनच ठेवला असता. शिर्के चिटणीस सुर्व्याचे लंडनला निघताना किती हाल केले, याची कल्पना रंगोबाला होतीच. शिवाय त्या वेळेप्रमाणे सरकारने दण्ड वगैरे मागितला, तर द्यायचा कोठून? आणि द्यायचा तरी का? ही सगळी आपत्ति टाळण्यासाठी त्याने आधीच दूर धोरणाने सगळे बातबेत ठरवून नक्की करून ठेवले होते. या कामी कॅपटन कोगनची त्याला फार मदत झाली. त्याने मसकतचे तीन आरब व्यापारी रंगोबाच्या दिमतीला देऊन, त्यांच्याबरोबर आरबी वेषांतराने खैबरघाटाच्या पार होऊन, अफगाणीस्थान, इराण, इराकमधून सीरियाच्या दमास्कस पर्यन्त जावे आणि तेथून बैरूटच्या बंदरातून, साधेल त्या युक्तीने पुढची सफर करावी, अशी कॅपटन कोगननेच गुप्त योजना ठरावून दिली होती.
ती पार पाडण्याच्या कामी त्या मसकतकर आरब व्यापाऱ्यांनी रंगो बापूजीला संपूर्ण सहाय दिले. स्वता रंगो बापूजी कामचलाऊ आरबी छान बोलत असे. म्हणून त्या तीन आरबांच्या कारवान काफिल्याबरोबर जाताना, त्याचे वेषांतर कोठेहि उघडकीला आले नाही. बैरूट बंदरात रंगोबा आपल्या तीन नोकरांसह, मालटाला जाणाऱ्या जहाजात रवाना झाल्यावरच त्याचे ते आरबी दोस्त ओमानला आपल्या गावी परत गेले. ‘द्रव्येण सर्वं यशः’ या कामी त्या आरब दोस्तानाहि भरपूर दक्षणा, त्याने दिली. अर्थात रोकड संपल्यामुळे रंगो बापूची अखेर मालदाला उत्तरला.
(आतोणे नजिक विळे येथे असलेले रंगो बापूजीचे ८७ वर्षांचे पुतणे कै. वामनराव देशपांडे याची मुलाखत. कै. गो. गो. टिपणिसानी घेतली तेव्हा शिर्क्याच्या डायरीतील रंगोबाच्या प्रवासाचा मसकत आरबस्थानचा संदर्भ वामनरावजीनी बिनचूक असल्याचा खुलासा केला. फक्त ते बैरूट बंदराचा बिथूर असा उल्लेख करीत होते. `बाजीरावाचे विथूर उत्तर हिंदूस्थानात आहे,` असे सागताच `छे हो, जगातला मोठा समुद्र आहे विलायतेच्या वाटेवर तेथले हे आरबांचे मोठे बंदर आहे.` असा वामनरावजीनी खुलासा केला. ५७ च्या युद्धात वामनराव आपल्या बंधूबरोबर दिल्लीच्या रणकंदनात लढून आले होते. ती हकिकत पुढे मी देणारच आहे. वामनराव सन १९२६ साली वारले.)
तेथे ४० दिवस अडकून पडला. हिंदुस्थान सरकारच्या हजारोळ्या हेरखात्याला गुंगारा देऊन खैबर पाटातून पुरपात पसार होण्याच्या या इतिहासाची, नेताजी सुभाषचंद्र बोसनी बरोबर १०० वर्षांनी केलेली पुनरावृत्ति आता जगजाहीरच आहे.
‘दिवाणबहादुर’ नातूची राजनिष्ठा
प्रतापसिंहाला काशीला नेऊन ठेवल्यावर, आप्पासाहेब छत्रपतीचे दिवाणबहादुर बाळाजीपंत नातू यानी प्रतापसिंहाला लिंबाला नेऊन ठेवल्यादिवसापासून तो त्याची काशीला ठाणबंदी होईपर्यन्त झालेल्या काशीयात्रेच्या खर्चाची वसुली, त्याला मेहरबानीने देण्यात येणाऱ्या दरमहा १० हजार रुपये नेमणुकीतून वसूल करण्याविषयी खुदावंत मुंबई सरकारला लिहून पाठविले.
इतकेच नव्हे तर महाराजाच्या बरोबर काशीला जे काही खिडूकमिडूक दाग-दागिने भांडीकुंडी गेली असतील. त्यांची तेथल्या गोर्या व्यवस्थापकाने यादी करावी आणि त्यांपैकी एकादा दागिना किंवा वस्तू प्रतापसिंह विकू अगर गहाण टाकू म्हणेल तर तसे करण्याची त्याला कायमची मनाई देऊन ठेवावी, अशीही शिफारस मुंबई सरकारमार्फत कलकत्याच्या बड़े लाटाकडे करण्यास नातू विसरला नाही. नाना फडणीस मेला तरी त्याची खुनसट परंपरा मेलेली नव्हती, हेच दिवाणबहादुर नातूने सिद्ध केले.
रंगो बापूजीच्या मागे गुप्त हेरांची ससेहोलपट लावलेलीच होती. रंगो बापूजी हाताला लागल्याशिवाय प्रतापसिंहाची बाजू थंड पडणार नाही, ही नातूची बालंबाल खात्री होती. पण तोहि नातूच्या बापाचे बारसे जेवलेला. मावळातल्या त्याच्या कारी गावी गुप्तहेरानी जाऊन, रंगोबाच्या भावाची (रावजी बापूजीची) खूप उलटसुलट तपासणी केली. महाशिवरात्रीचा उपासाचा दिवस होता तो. "आमचा नि भाऊचा (रंगोबाचा) संबंध मागेच तुटलेला आहे, त्याचे येथे काही नाही" असे सांगून त्याना वाटेला लावले रंगो बापूजी तेथेच होता.
प्रतापसिंहाने मुंबईच्या काही देशी विलायती पेढ्यांवर रोकड रकमा नि जवाहीर ठेवलेले होते. नातूने याहि बाबतीत डोके लढवून, मुंबई पोलिसांच्या मार्फत त्या पेढ्यांचे हिशोब तपासून, मिळाल्या त्या रकमा नि जवाहीर जप्त करून साताऱ्याला नेले. शिर्क्याच्या लंडन खर्चासाठी ४० हजार रुपयांचे जवाहीर नरोत्तम बालमुकुंद पेढीवर ठेवलेले होते. ते जप्त करण्यात आले. रंगो बापूजीने मात्र धोरण राखून महाराजाकडून आलेल्या हुंड्या जेव्हाच्या तेव्हा वटवून लंडनच्या पेढ्यांवर घेतलेल्या हुंड्या आपल्या आंगरख्याच्या आत, इतर महत्त्वाच्या कागदांसह बेमालूम शिवून टाकलेल्या होत्या. माल्टाला पोचेतोंवर यातल्या बऱ्याच हुंड्यांची वाट लागलेली होती. जवळ रोकड उरली नाही. म्हणूनच तो जेमतेम माल्टार्पन्त आला. नि तेथे पैशासाठी अडकून पडला.
ता. २ जुलै १८४० रोजी लंडनहून रंगोबाने महाराजाना काशीला पाठवलेले पत्र (पे. द. भाग ४२, पान १०८) एकंदर परिस्थितीवर प्रकाश पाडणारे असल्यामुळे ते तेथे देत आहे-
श्री.
"शेवेसी विनंती. शेवक रंगो बापूजी चरणार मस्तक ठेऊन विज्ञापना, ता. छ २ जी. मु. ता. २ जुलाई सन १८४० झा परियंत मुगा शहर लंडन येथे सुखरूप असो. यानंतर मी मुंबईहून निघालो तो सरकार हुकुमाप्रमाणे ता. ३० जून आषाढ शु १ मंगलवारी प्रातः काली पावलो. नंतर कपतान राबट कोगन साहेबाची भेट घेऊन नंतर दुसरे कोणी दोस्ताच्या भेटी तेच दिवशी घेऊन नंतर आपले मंडलीचे बिराडास संध्याकाली आलो. दुसरे दिवसी कामाची सिस्त कसी चालली ती संकळीत समजून घेतली. त्यात कंपणी बोलण्यावरून कागद छ्यापून बुके पारलमेंटात द्यावी असा हुकूम जाला आहे. श्रीमंत राजेश्री सेनापति साहेब कैलासवासी जाले व सरकारास या संकटात हे दुख जाले. इश्वर खऱ्यामागे अनेक तन्हेच्या अडचणी आणून क्लेश होत गेले हे कलोन शोकाची जालो. असो. ईश्वराची मर्जी. खावंद सरकार धैर्यवान समर्थ, तेथे विनंती काय लिहू? सारांश, इंग्रजी सरकार अवल इनसाफी आहेत. श्री येश घेऊन सरकारी काम शेवटास नेणार समर्थ आहे. मंडलीपासी खर्चास नाही. मी येताना काही तजवीज व्हावी तो बेल वैरियावर देखील नसावा, असे जाले. येथील खर्च कसा निभेल? खर्च तरी भारी. ईश्वर कसे निभावील हा मात्र मोठा घोर आहे. मी मात्र प्रेत्नेकरून या मुकामी येऊन पावलो. परंतु विस्तारे विनंती लिहिण्यास लाच्यार, सरकारपासी तरी पैसा नाही. येथे आहो त्यास तरी पोटास अन व अंगास वस्त्रे पाहिजेत. यातून कोणी परत जावे, कोणी रहावे, असे कोणी दोस्त याचे म्हणण्यात, परंतु आलियाने जावे तरी पैसा नाही. राहणे तरी खावयास पैसा नाही. आम्हा सर्वत्र मंडलीचा द मीर अफजलअलीसुद्धा खर्च दरमाहा अजमासे तीन हजार परियेत लागतो. मग शेपनास कमजास्ती काय होतील ते असो, तेव्हा बारमाही तोड लागणे येथे तरी स्वदेश नव्हे. खेरीज कोडत कागद छापणे वगैरे हाहि खर्च मोठा आहे. खर्चाची तरी अडचण म्हणोन कोणी जाये कोणी राहावे जाले, तरी जनात मात्र कार्य न होता, बोलणार उठोन गेले हा दुर्लोकिक होणार. अशा अडचणी अनेक प्रकारच्या आहेत तेव्हा मति कुंठीत आहे. मंडलीपासी तरी या महिन्याची बेगमी होईल न होईल असे आहे. हा मजकूर यासमई सरकारास मी न स्वाहाचा परंतु तजवीज निघाली पाहिजे. करणारानी तर पैशाची पुरवणी न व्हावी, माणसे पोटास न मिले तेव्हा उठोन येतील. म्हणोन असा प्रसंग सरकारवर गुजरला. ईश्वर कसी आवस राखील तीन कले. आज्ञोतर आले पाहिजे, शेवेसी मृत होय हे विज्ञापना."
कोणतीहि तारीख तिथि मिती स्पष्ट दर्शवून लिहिण्यात कधीहि न चुकणारा रंगो बापूजी या पत्रात मुंबईहून आपण कचि निघालो याचा मागमूसहि दर्शवीत नाही. फक्त मी मात्र प्रेत्नेकरून या मुकामी येऊन पावलो. एवढेच सांगतो तेव्हा रंगो बापूजी कोणत्या मार्गानि लंडनला कसा जाणार याचे रहस्य प्रतापसिंहाला माहीत असले पाहिजे, करणारानी तर पैशाची पुरवणी न व्हावी.... या वाक्याने सातारच्या नव्या नातूशाही राजवटीचा दर्शविलेला संदर्भ चाणाक्ष वाचकांच्या ध्यानी आलाच असेल.
हे खासगी भानगडींचे पत्र लिहून, शिवाय आणखी एक सरकारी पत्र (ऑफिशियल) शिर्के, भगवंतराव, सुर्वे नि रंगो बापूजी याच्या सह्यांचे ता. २ जुलैचेच पाठविले. त्यात "कुवईन इकटोरिया प्रच्य (प्रिन्स) आलबर्ट याजला (लग्न) जाहाले," त्याची बातमी देऊन, महाराणीला अभिनंदपर पत्र पाठविण्याची सूचना केली, सातारा प्रकरणाचे यच्चावत कागदपत्र पार्लमेण्टाने छापण्याविषयी ६ मे १८४० च्या जनरल कोर्टाच्या सभेत वादविवाद झाला, त्याची माहिती दिली. मॉरिशस बेटात हिंदी मजूर पाठविण्यात येतात, त्या विषयी पार्लमेण्टात कडाक्याचा वाद झाला, तो मजकूर दिला. शेवटी माहाराज सरकारची खाजगी दौलत व कारखाने वगैरे सर्व महाराज सरकारचे माहाराज सरकारात असावे, व सेनापतिसाहेब यास रस्त्यात अडवून तसलमात ऐवज येणे म्हणोन त्या ऐवजात दागिने वगैरे घेतले, त्याजविसी व त्याचे खासगीची पगाराविसी यादीत १ जून रोजी डारेक्टर कोटोला दिल्याचे कळविले आहे.
कॅपटन कोगन याने ता. ४ जुलै १८४० चे पत्र मुंबईला डॉ. जॉन मिलन याना पाठविले त्यातला मजकूर या वेळच्या परिस्थितीवर छान प्रकाश पडतो. `इंग्रजी पत्राचा तर्जुमा नकल’, (पे. द. भाग ४२ पान ११२)
मेहेरबान दोस्ता डाकटर ज्यान मिल्न साहेब मु. मुंबई, सलम हू.
दिगर तुमचे पत्र ता २९ अप्रेल सन १८४० रोजीचे आले ते पावोन संतोष जाहाला. ऐसेच निरतर पत्र पाठवून वर्तमान कलवीत असावे. या नंतर इकडील मजकूर येणेप्रमाणे
२. दुसरी खुष खबर की राजश्री रंगो बापूजी लंडन मुकामी ता २७ जून सन १८४० रोजी सुखरूप येऊन पोहोचले. ते गरीब बिचारे त्याजला खर्चास नाही. त्याजमुले मालट्यास होते. त्यास पत्र लिहून नोराचा पतकर आम्ही घेतला आणि त्यास येथे आणविले. व माहाराजाविसी अथवा त्याचे लोकासी हाच आमचा देण्याघेण्याचा पहिला व्यवहार, हे आपले ध्यानात असावे. मेघडलीन साहेब यास लवरपूल येथे तुमचे पत्र आले होते की माहाराज सरकारचे लोक आले आहेत, त्यास खर्चास द्यावे व आम्हासहि याप्रमाणे लिहून आले होते. बरे आहे. ते बिच्यारे गरीब वकील लोक निराश्रित येथे आले आहेत. त्यास खर्चास दिल्हे पाहिजे, अथवा आपआपल्यात वरगणी काढून त्यास खर्चास पोचवावे. कोणीकडून त्यास खर्चाची सोय केली पाहिजे व माहाराज सरकारचे मोकदम्याविसी मदत करणार ते पूर्वीचे साहेब लोक आहेत. त्याखेरीज दुसरेहि साहेब लोक अनकूल होत चालले आहेत. मोकदम्या प्रकर्णी कागदपत्र दाखवीत असतो. पारलमेंटात मोकदमा नेण्याची तजवीज केली आहे. परंतु कागद आद्याप छापले नाहीत. त्यास ते कागद छापविण्याबद्दल येक महिन्यावर दिवस लागतील. सबब हाली पारलमेंट बसले आहे यास ते कागदपत्र पोहोचतील असे दिसत नाही. परंतु प्रापरायेटर याचा विच्यार असा आहे की राणी सरकारास अर्जी देऊन मोकदम्याचे तपासणीविसी कमेटी मागावी असे आमच्या ऐकिण्यात आहे.
३. मोकदम्या प्रकर्णी मुंबईस गवरमेटचे कागदपत्र जे आले ते आम्ही सर्व पाहिले आहेत. त्यास असी काही नालस्त लिहिली आहे की ते आपले मनी मानसीहि नसेल. तुमचा व बोबर साहेब हे कपणी सरकारचे नोकर असून महाराज सरकारास सला दिल्ही, हा त्याजवर गुन्हा आणिला. त्याजवरून असे दिसते की मुंबई सरकारचे कवसलदार माहाराज सरकारचे राज्य बुडविण्याचे तजविजीत फार असावे. या मोकदम्या प्रकर्णी कागद कोणाचे द्रिष्टीस पडू नयेत याजमुळे फार बंदोबस्त ठेविले असतील व उलबीसाहेब सकटतार व आणखी साहेब अंतस्त मसलत देणार आणि मेस्तर फेरीस साहेब व त्याची मंडली कौसलदार माहाराज सरकारचे राज्य बुडविण्याबदल फार मेहनत करीत आहेत असे नजरेस येते. तुम्ही मोठे फजितखोर, असी तुमची नालस्ती लिहिली आहे. व तुम्हा आम्हास लोभ दाखऊन मोकदम्याचा पुरावा करण्याबद्दल इकडे आमची रवानगी तुम्हीच केली आहे, असेहि लिहिले आहे. या सिवाय तुमचे नालस्तीचा विस्तार फारच लिहिला आहे तो आम्ही तुम्हास पुढील आगबोटीत लिहून कलवू.
करणेल वोविन साहेब आम्ही पाहिले नाही. परंतु त्याचे लिहिण्यावरून आमचे नजरेस असे येते की ते मनुष फार नादान आहेत. त्याणीहि तुमची व आमची नालस्ती फार लिहिली आहे. असा नालस्तीचा मजकूर अंतस्त लिहितात. येविसी आपल्यास बंदोबस्त केला पाहिजे असे लिहिणार आहेत ते कसे, हे इकडे सर्वाचे दिलात आणून देऊन मेस्तर बोबर साहेब याणी चाकरी सोडली हे बरे जाहाले. कारण की ते जर आज कंपणी सरकारचे ताबेत असते तरी आज जसे आपण बोलून जबाब विच्यारतील. आपले पेनसनची सबब ते लिहितात. परंतु बाछ्याई सरकारचा काइदा सबल आहे. त्याचेनी आपले पेनसीन बंद करवत नाही. ही खात्री ठेवावी.
सही राबट कोगन
ताजा कलम. कारणले सिमिस साहेब यास दरेकटरची जागा जाहाली आहे व पुढे जंदर राबटरसन (रॉबर्टसन) यास कोर्टडरेक्टरची जागा मिळेल. सर च्यारलस फारबस त्याविसी मदत करीत आहेत. राबटसाहेब सर चारलस साहेबास पत्रे पाठविली ती त्याजकड़े दिल्ही.
लंडन ता. ४ जुलाई १८४०.
लंडनच्या डाकेची मुंबईला पकडापकडी
प्रतापसिंहाकडे जाणार्या येणाऱ्या डाकेवर नातूच्या एजंटांची कावळी नजर असल्याचे रंगो बापूजीला माहीत असल्यामुळे, अस्सल आणि नक्कल अशा पत्रांच्या दोन प्रति निरनिराळ्या डाकेने आणि निरनिराळ्या लाखोट्यातून पाठविण्याचा क्रम त्याने आता चालू केला. कॅपटन कोगनच्या पत्रासकट वरील तीनहि पत्रे अखेर नातूच्या एजंटानी मुंबईला धरून, ता. ९ सपर्टबर १८४० च्या आपल्या पत्रा बरोबर साताऱ्याला रवाना केली. या पत्रात हा एजेंट महाशय लिहितो. “त्यास (प्रतापसिंहास) उमेद व बदसला देण्याचे अद्यापि पहिलेप्रमाणे काम चालत आहे, ते या नकला पाहिल्यावर समजण्यात येईल."
प्रकरण २४ वे
रंगोबाचा ‘मऱ्हाठी’ बाणा गाजला
रंगो बापूजीने लंडनच्या एकंदर राजकारणी वातावरणाचा थोडयाच दिवसांत बराच अंदाज काढला. दुरून डोंगर साजरे न्यायाने, हिंदुस्थानात असताना विलायतेचा मामला जितका साजिरा गोजिरा वाटला, तसा तो नव्हे, हे त्याने ओळखले. अर्जाअर्जीच्या सरळ मार्गाने कंपनीच्या वरिष्ट फत्तराना माणुसकीचे अंकुर फुटणार नाहीत. त्यासाठी इंग्लीश जनतेलाहि आपल्या बाजूने उठवली पाहिजे, हे त्याने बिनचूक हेरले. अनेक वजनदार सज्जन इंग्रज अधिकाऱ्यांचे पाठबळ त्याने मिळविले असले, तरी पैशामुळे त्याला कोठेच काही जोरदार हालचाल करता येई ना. जवळचा पैसा संपला. न्याहारी मिळाली, तर जेवणाचा फाक्या, नोकर लोकांचे पगार थकलेले. एवढे मोठे श्रीमंत लंडन शहर, पण त्याच्या श्रीमंतीचा या परदेशी हिंदू वकिलाना उपयोग काय? बरे, छत्रपतीचे वकील म्हणून आपल्या बाह्या थाटात आणि भेटीभवरी पाठवून तेथल्या नगरदेवांची मर्जी संपादन करण्यासाठी लागणार्या खर्चात खंडहि पाडता येईना.
अशा किचकट पेचात ही मंडळी सापडली. यशवंतराव, भगवंतराव, सुर्वे मंडळीनी तर हातपायच गाळले. पैशेच नाहीत तर येथे राहून परदेशी फुकट मरण्यात तरी अर्थ काय? शिवाय दर डाकेला शिर्क्याच्या घरची वतनाच्या भानगडीची नि नातेवाईकांच्या भांडणांची पत्रे टिपली यायची. धन्याचा खटला आणि घरची खटली, अशा कैचीत सापडल्यामुळे, शिर्क्याची मनःस्थिति बेजार झाली. तेथला परिवार एकंदर १८ असामींचा, त्याचे वर्णन शिर्के असे देतो.- "लंडन मुकामी माहाराज सरकाराकडील मंडळी. खुद आम्ही १ चिटकोजीराव सुर्वे १ आमची माणसे असामी ३ व भगवंतराव विठ्ठल १ त्याचा सिशा रावजी वैद्य १ व त्याचे माणूस १ व सयद मीर १ त्याचा दुसरा सोबती १ नाव (येथे एक इंच जागा रिकामी सोडली आहे.) त्याची माणसे २ य रंगो बापूजी १ सिशा रावजी बापाजी १ व गडी आसामी २ एकूण तेंदू असामी व मुसलमान मिळोन येकंदर असामी १६ सोळा. आणि दुभासी एक मुंबईहून ठेऊन आणिलेला व दुसरा किरस्ताव जाहाजात होता तो लंडन मुकामी ठेविला, असे हे दोघे एकूण असामी अठरा जमल्या." या अठरांची दोनप्रहर साजरी करता करता तीन तेरा उडत असे.
अखेर सयद मीर आफजल अल्लीने कंपनीच्या डायरेक्टर कोर्टाला विनवणीचा अर्ज दिला की,- “सरकार दरबारी माझ्या खटपटींची निराशा झाली. गेले दोन वर्षे येथे राहिल्यामुळे माझी प्रकृति बिघडली. बरोबर एक सेक्रेटरी नि दोन नोकर आहेत. सातारा राजाची नि राज्याचीहि घडी विकसटल्यामुळे माझा येथे काही तरणोपाय उरला नाही. निराशेने नि दुखाने स्वदेशी परत जाणे मला आता भाग आहे. तेव्हा कोर्टाने दयावंत होऊन, सातारा सरकारच्या अमानतीवर ७०० पौंड प्रवासासाठी देण्याची कृपा करावी, अशी प्रार्थना आहे.” (ता. १४ सप्टेंबर १८४०)
कंपनीच्या दुष्कर्मांची ढोलकी वाजवणाऱ्या वकिलांच्या टोळक्यातला एकादाच असामी गेला काय नि राहिला काय, त्याची पर्वा कोर्टाला नव्हती. त्यानी सरळ जबाब दिला कीं "राजाचे वकील म्हणून येथे रहाणाऱ्या अनेक लोकांपैकी एकाच्याच परतपाठवणीचा प्रश्न विचारात घेण्याची कोर्टाला जरूर दिसत नाही." बाकीच्या मंडळींचा तसा काही विचाराच नव्हता. अखेर सर चार्लस फोर्ब्स साहेबाने पदरची रकम देऊन या वकील मिय्याला एकदाचा दिला परत पाठवून मुंबईला, १८ पैकी ४ तोंडे खादीला कमी झाली!
कंट्रोल बोर्डाचे चेअरमन सर जॉन हॉबहीस या ‘पागोटीवाल्या हिंदू’च्या चळवळीवर एवढे गरम झालेले होते का त्यांच्यापुढे प्रायमस स्टवचा भडका काहीच नव्हे. एकदा ते कॅपटन कोगनला इंडिया हौसमध्ये समोरासमोर भेटले असता सरसाहेब गुरगुरत म्हणाले "Captain Cogan, you have joined a party with Sir Charles Forbes to embarrass the Government, and to bring this case before parliament. I swear that I will never allow the Rajah to sit on the Gide again. I will support the Government of India right or wrong and put a stop to these Turbaned Gentlemen filling London with their appeals. (भावार्थ.- कपतान कोगन, तुम्ही व सर चार्लस फोर्ब्स यानी कट करून या गवरमेंटला त्रांगड्यात आणण्यासाठी, पार्लमेंटात हा खटला आणण्याची धडपड करीत आहा. पण खूप याद राखून ठेवा, मी या राजाचे पाय गादीला कधीहि लागू देणार नाही, असे प्रतिज्ञेयर सांगतो तुम्हाला. हिंदुस्थान संरकारची करणी बरी असो, वाईट असो, मी तिचाच पुरस्कार करणार आणि सार्या लंडनभर अपिलांची धामधूम उडवणार्या या `पागोटीवाल्या हिंदू` च्या चळवळीची नांगी मोडणार.)
ब्रिटीश इंडियन सोसायटी, लंडन.
दिल्लीचा बादशहा शहा आलम याला कंपनी सरकारने ठकवून ठेचल्यामुळे, त्याच्या दैवाची दाद लावण्यासाठी राजा राममोहन रॉय लंडनला गेला होता. राममोहनचा एक इंग्रज जानीदोस्त मि. आडाम १८३९ च्या जुलै महिन्यात हिंदुस्थानातून परत लंडनला आल्यावर, लॉर्ड रूम यांच्या सहायाने त्याने तेथे ब्रिटीश इंडियन सोसायटी स्थापन केली होती. या कामी आडामने प्रतिष्ठित हिंदी पुढार्याकडून बराच फंड जमवून आणलेला होता आणि त्यात प्रतापसिंहाची देणगी फार मोठी होती. रंगोबाने आडामला गाठून त्याच्या सोसायटीचे पाठबळ मिळविले. सन १८४१ च्या जानेवारीत या सोसायटीच्या विद्यमाने ‘ब्रिटीश इंडिया अॅडव्होकेट’ नावाचे इंग्रजी मासिक मि. आडामच्या संपादनाने चालू झाले.
यात हिंदी जनतेची हरएक प्रकारची गाऱ्हाणी मुद्यापुराव्यांसह छापून प्रसिद्ध करण्याचा धडाका चालू झाला आणि सातारा प्रकरणाला प्रसिद्धीचा अग्रमान मिळू लागला, यात नवल नाही. आपली गार्हाणी विलायतेच्या जनतेपुढे साकल्याने मांडायची स्वताची सोय झाली. हे पाहून रंगो बापूजीला पुष्कळ धीर आला. या मासिकाचा इंग्लंड स्कॉटलंड आयर्लण्ड आणि फ्रान्समध्येहि जोराचा प्रसार होऊ लागला. कंपनीच्या बड्या बनियाना या नवीन संकटाने निद्रानाशाचा रोग जडला.
गोवाकटाच्या पुराव्याचा सोक्षमोक्ष
सर चार्लस फोर्ब्स प्रभृति मंडळीच्या जोरदार यत्नाने सातारा प्रकरणाचे सर्व उघड गुप्त सरकारी कागद छापण्याची सुरुवात झाली होती. एकामागून एक पुस्तकें बाहेर पडत होती. गोवा कटात ज्या डॉन मॅन्युअल गवर्नरचे नाव गोवले होते, तो या वेळी लिस्बन येथे मोठा दरबारी अधिकारी होता. ता. ८ नवंबर १८४० ला रंगो बापूजीने त्याला आदबशीर पण तपशीलवार पत्र लिहिले. त्यात प्रतापसिंह आणि डॉन मॅन्युअल यांचा इंग्रेजाना हुसकावून देण्याचा कट झाला, त्याच्या तहनाम्याची इंग्रजी आणि पोर्च्युगीज नकल पाठवून, मयत गवर्नर ग्रांट याने या कटाचे केवढे काहूर माजवले, याची माहिती दिली. यावर नामदारांचे काय म्हणणे आहे ते कळवावे, अशी प्रार्थना केली. बरेच दिवस झाले तरी काही उत्तर येई ना.
शेवटी लंडनला लिसबनचा सिन्होर अंटोनिओ रॉड्रिग्ज नावाचा एक वजनदार पोर्च्युगीज गृहस्थ आला होता. त्याच्या बरोबर पुन्हा पत्राची नि तहनाम्यादि कागदांची नक्कल थेट पोच करण्याची व्यवस्था केली. (१-१-१८४१) मॅन्युअलने ताबडतोब ता. १८ जानेवारीला जबाब दिला की या प्रकरणाची भानगड मी आजच ऐकत आहे. मला त्याची शपथेवर काही माहिती नाही. पोर्च्युगाल दरबारच्या शिक्क्याने आलेले हे पत्र रंगो बापूजीने इंग्लिश वर्तमानपत्रांत तर छापलेच, पण पार्लमेण्टरी कागदांत छापण्यासाठी डायरेक्टर कोर्टाच्या हवाली केले.
रंगो बापूजी निरनिराळ्या मुद्यांवर कोर्टाकडे अर्ज करीत होता नि सातारा राजाचे वकील म्हणून आम्ही तुम्हाला ओळखत नाही, अशी कोर्टाची ठरावीक सांध्याची उत्तरे येत होती. होईल ती अर्जाअर्जी वर्तमानपत्रांत छापून रंगोबाने सार्या इंग्लंडभर नुसता धुमाकूळ घातला होता.
वकिलातीला आणखी गळती
रंगो बापूजीच्या बाहेरच्या खटपटी कितीहि चालल्या असल्या तरी बिऱ्हाडाच्या चुलीचे तोंड जळण्यासाठी आ वासून बसलेले असे. अखेर यशवंतराव शिर्के, भगवंतराव विठ्ठल चिटणीस आणि चिटकोजी सुर्वे या तिघांनी ता. १६ मार्च १८४१ रोजी आपल्या कर्मकहाणीचा अर्ज देऊन, डायरेक्टर कोर्टाकडे स्थानिक कर्जाच्या फेडीसाठी नि हिंदुस्थानात परतण्याच्या प्रवास खर्चासाठी २००० पौंडाची मागणी केली. त्यात आमच्या महाराजाना कंपनी सरकारने एका वस्त्रानिशी बाहेर काढले, त्यांची खानगी मालमत्ता जप्त केली. शिवाय आमच्यासाठी मुंबईच्या काही पेढ्यांवर महाराजांनी ठेवलेल्या ठेवी सातारच्या नव्या नातू दिवाणाने हिसकावून नेल्या, तेव्हा आम्ही मागतो ती रक्कम त्या मानाने अगदी क्षुद्र आहे. तेवढी कृपेने दिल्यास आम्ही "आधी आलेले वकील आमच्या परिवारासह निघून जातो." अशी प्रार्थना केली. या अर्जाला ता. ७ एप्रिलचे स्पष्ट नकाराचे उत्तर आले.
यावर १० एप्रिलला पुन्हा एक जोरदार विधानांचा अर्ज शिर्क्याने केला. काही वजनदार पार्लमेण्ट मेम्बरानी पुरस्कार केला. तेव्हा १५ मे ला जबाब आला की आधीचे नि मागचे असा काही भेद न करता, तुम्ही सारे वकील येथून निघून जात असाल तर तुमची मागणी मंजूर करण्याचा विचार पहाता येईल. बनियानी खोचदार पेच मारला! सगळ्यानीच निघून जायचे, तर आलो तरी कशाला आणि येऊन केले तरी काय? परत जाऊन लोकाना सांगायचे तरी काय नि तोंडे तरी कशी दाखवायाची? यशवंतराव तर पुरा गडबडला. बाहेरची भटकंति उरकून रंगोबा बिन्हाडी येताच त्याला तो जबाब दाखवला. थोडा वेळ विचार करून तो म्हणाला.- "ठीक आहे यशवंतराव, म्हणावे आमचे येथले कर्ज पै नि पै फेडा, प्रवासखर्च द्या, जातो आम्ही सगळे”, असे लिहा आजच्या आज. आधी कर्जमुक्त होऊन येथून आपण बाहेर पडू, मग मला काय करायचे ते मी करतो! तसा अर्ज जाताच झटकन उत्तर आले की तुम्ही आधी जहाज ठरवून तसे कळवा म्हणजे कर्जफेडीसाठी २५०० पौंड देऊ, जहाजखर्चाचीहि रकम देऊ. कर्जाची यादी पाठविली.
२५०० पौडात ते भागत नव्हते. म्हणून एकंदर ४००० पौंड रकम देण्यात आली. ता. १ जुलै १८४१ गुरुवारी सकाळी, `ओरिएण्टल’ आगबोटीने सौदंम्प्टन बंदरातून, अलेक्झांड्रियाच्या मार्गाने (भूमध्य समुद्रातून आलेक्झांड्रिया बंदरापर्यन्त बोटीने यायचे. तेथे उतरून पुढे खुषकीच्या मार्गाने सुएझपर्यन्त येऊन पुन्हा तेथे बोटीत बसायचे आणि तांबड्या समुद्रातून पुढे मुंबईला रवाना व्हायचे, हा नवा प्रवासाचा मार्ग लॉर्ड विल्यम बेंटिकच्या अमदानीत चालू झाला. सन १८३९ साली शिर्के मंडळी वार्यावर चालणार्या गलबत्तातून केपला वळसा घालून लंडनला जाताना त्याना १४४ दिवस प्रवास करावा लागला होता. आता या नव्या मार्गाने ते अवघ्या ६८ दिवसांत लंडनहून मुंबईला येऊ शकले. आलेक्झांड्रिया ते सुएझचा उंटावरला खुपकीचा प्रवास पत्करला नाही. म्हणून भगवंतराव विठ्ठल चिटणीस तेवढा आगबोटीनेच परंतु केपला वळसा घालून कलकत्त्याला गेला.)
शिर्के सुर्वे नि रंगो बापूजी मुंबईला निघाले. ता. २ रोजी भगवंतराव विठ्ठल नि त्याचे नोकर सेण्ट हेलन्स बंदरातून, `बुसिफलस’ बोटीने केप ऑफ गुडहोपच्या मार्गाने कलकत्त्याला जाण्यासाठी निघाले.
निघण्यापूर्वी यशवंतराय शिर्क्याने डायरेक्टर कोर्टाकडून एक अभयपत्र मागून घेतले. त्याचे काही नातलग आप्पासाहेब भोसल्याच्या पक्षाला मिळून, त्यानी यशवंतरावाच्या वतनगावांत बरीच घालमेल उडवलेली होती. शिवाय आता सारी सत्ता आप्पासाहेबाची नि यशवंतराव तर प्रतापसिंहाचा उघडउघड पक्षपाती वकील, तेव्हा गावी परत गेल्यावर कंपनीच्या किंवा सातारच्या नोकरशाहीकडून स्वताला किंवा स्वताच्या इष्टेटीला काही उपद्रव होईल या भीतीने, त्याने डायरेक्टर कोर्टाला अर्ज केला की, "आम्ही आपले बंदोबस्ताविसी लिहिले की आम्ही आपले मुलकात गेल्यावर आम्हावर कोणी दुस्मानी करू लागतील, त्याचा बंदोबस्त सरकारातून होत असावा आणि जे आम्हाकडे गावखेडे वडिलोपार्जित चालत आले ते आमचे आम्हाकडे चालावे त्यात कोणी गैरसिस्त आम्हासी चालू लागेल त्याचा बंदोबस्त करावा म्हणोन ता. (¾इंच जागा कोरी) मजकुरचे पाठविले."
त्याचा जबाब या तुमचे लिहिण्याप्रमाणे बंदोबस्ताविसी मुंबई सरकारला पत्र पाठविल्याचा आला. "इतके आश्वासन शिर्क्याला मिळाले. तेव्हा त्याचा पाय जहाजावर चढला. विलायतेहून परत आल्यानंतर शिर्क्याचा इतिहास मला मिळाला नाही आणि त्याचे आता या ग्रंथात काही प्रयोजनहि उरलेले नाही. यशवंतराव राजे शिर्के हा राजनिष्ठ स्वराज्यसेवक होता, यात काही शंका नाही.
रंगोबा मालट्याला उतरला
ओरिएण्टल आगबोट माल्टा येथे येतांच रंगोबा एकटाच तेथे उतरला. यशवंतरावला आश्चर्य वाटले. रंगोबा म्हणाला.- "यशवंतराव तुम्ही सारे आता घरी जा. मी परत लंडनलाच जाणार. एवढे माझे पत्र रावजीला (धाकटे भावाला) द्या. त्यात सगळा खुलासा मी केला आहे. सरकार स्वारी परत सातारला येईपर्यन्त मी स्वदेशाला तोंड दाखवणार नाही. मरे तोवर मी लंडनलाच झगडत रहाणार. एकटा जीव माझी कोणी काळजी करू नका. भाकरीचा तुकडा निघोटभर पाणी मिळाले का माझे भागले, तुमच्यासारखे माझे वतनबितन थोडेच काही आहे! जगाच्या पाठीवर कुठेहि रहायचे, तो मी लंडनलाच काय होईल ती सरकारसेवा करीत रहाणार. तुम्ही सारे जा." ता. ६ सपटंबर १८४१ रोजी यशवंतराव शिर्के परिवारासह मुंबईला येऊन पोचला. त्याच सुमारास भगवंतराव चिटणीस कलकत्त्याला पोहचून तेथेच राहिला.
तसे पाहिले तर रंगोबा `एकटा जीव’ मुळीच नव्हता. घरी मावळात त्याची पत्नि, उमेदवार मुलगा सीताराम, वृद्ध वडील, दोन कर्ते भाऊ, त्यांचा परिवार, शिवाय नाता गोतावळे किती तरी होते. संसाराची सारी हिंमत रंगोबावरच होती. विलायतेला असे तोवर २००० रुपये पगार ‘ठरलेला’ होता. पण त्या ठरावाची वासलात मुंबईहून पसार होण्यापूर्वीच ‘ठरून’ गेलेली होती. विलायतेचे राजकारण हा नुसता पैशाचा खेळ नसून, पिशाच्चाशीहि तो एक प्राणांतिक खेळ होता. डायरेक्टर प्रोप्रायटरादि भांडवलवाले हिंदुस्थानात आता ‘कायद्याने प्रस्थापित केलेले सरकार’ बनल्यामुळे, त्याना न्याय नीति माणुसकी यांचीहि चाड राहिलेली नव्हती. यापुढे ‘छत्रपतीचा मोकदमा’ लढवीत बसणे म्हणजे कठोर खडकावर कपाळमोक्ष करण्यासारखाच एकंदर मामला होऊन बसला होता.
माल्टाहून रंगोबा आपल्या बंधूला लिहितो.- "तुम्हाला वडिलाना नि महाराज सरकारना भी कळविलेच आहे की काम फत्ते झाल्याशिवाय स्वदेशी मी परत येणार नाही. अपयशाचे काळे तोंड घेऊन परत येण्यापेक्षा मेलेले काय वाईट? माझ्या अडचणी नि तकलिफा किती लिहिणार? सारा भार परमेश्वरावर सोपवून भी आपल्या शक्तियुक्तीची कसोशी करीत लंडनलाच रहाणार, सरकार स्वारी सन्मानाने सातारला परत येईपर्यन्त मी तिकडे येणार नाही." धन्याच्या सर्वस्वाचे वाटोळे होऊन बसले असतानाहि त्याच्या स्वराज्यासाठी, हरुनाहक बदनामीच्या भरपायीसाठी सत्याच्या आग्रहासाठी नि न्यायाच्या अट्टहासासाठी, सांसारीक कौटुंबीक सार्या मायामोहला रामराम ठोकून, बनिया कंपनीच्या पाषाण हृदयावर टकेरा देण्यासाठी सजलेल्या नि धजलेल्या रंगो बापूजीला `वतनासाठी धडपडणारा’ आणि ‘एलफिन्स्टनची भाड खाणारा’ अशा शिव्या देणारे ठाण्यापुण्याचे हयात मयत भट इतिहास संशोधक बाळाजीपंत नातू नि चिंतामणराव सांगलीकराचीच अस्सल अवलाद नव्हेत काय?
रंगोबाचे लंडनला पुनरागमन
बनिया कंपनीची `लंडन छोडो`ची अट अक्षरशः पाळून, १८४० च्या डिसेंबर अखेर रंगो बापूजी माल्टाहून परत लंडनला येऊन दाखल झाला. सगळे लाल पागोटीवाले चळवळ्ये आता कायमचे लंडनपार झाले, अशा खुबीत कंपनीचे अधिकारी आपल्या अक्कलहुषारीची गाजरे चघळीत असतानाच, रंगो बापूजीच्या लाल पागोट्याचा धूमकेतू अवचित पुन्हा लंडनभर भटकताना पाहून, ते चकितच झाले. खटास खट भेटे तेव्हा मनीचा संशय फिटे, प्रवासखर्चाची नि कर्जफेडीची अडचण परस्पर भागली, कंटाळलेली मंडळी स्वदेशी रवाना झाली. कोर्टाची अट पाळली गेली नि रंगोबाची स्वारी पुनश्च हरिः ओम् करायला लंडनमध्ये जेठा मारून बसली. खर्चाविषयी फोर्ब्स कोगन वगैरे इंग्रज मित्रानी शंका काढताच, रंगोबाने जबाब दिला.- "अहो मी एकटा जीव. जंगलो काय नि मेलो कायसारखाच! सरकारच्या कामात पडलो तेव्हाच घरादाराला मुकलो. माझ्या धन्याला न्याय मिळाल्याशिवाय मी आता येथून हालणार नाही." रंगोबाचा निश्चय पाहून त्याच्या सर्व इंग्रज मित्रांनी त्याला हवे ते सहाय देण्याचे आश्वासन दिले. मालट्याच्या गैरहजेरीत थंडावलेली चळवळीची सारी कामे रंगोबाने पुन्हा जोरात चालू केली.
याने २४ जानेवारी १८४१ रोजी जनरल कोर्टाला लिहिले.- "मालटाला असताना महाराज सरकारची तीन वेळा मला डाक आली. आमच्यावरील आरोप तेवढे तुम्ही ऐकलेत पण आम्हाला मात्र बचावाचा एक शब्दहि तुम्ही बोलू देत नाही. आमची उघड चौकशी करा म्हटले तर तसा तुम्हाला धीर होत नाही. तुमच्या क्रिश्चन धर्मात अशीच नीति सांगितली आहे काय? याचा पक्का छेडा लावण्यासाठी मला येथेच ठाण मांडून बसण्याचा हुकुम झाला आहे. या सोबत महाराजांचेहि एक पत्र त्याने जोडले. त्यात घडलेली सर्व हकिगत, आपल्यावर झालेला अन्याय, काशीच्या हवेत प्रकृतीवर होत असलेला वाईट परिणाम आणि इतर हाल यांचा तपशील आमच्या सर्व मोठमोठ्या दरबारी अधिकार्याची सातारा पुणे येथल्या कंपनीच्या अधिकार्यानी चालविलेली छळणूक यांचा पाढा वाचून दुष्टांचे न्यायाने पारिपत्य करून आम्हाला न्याय मिळावा, अशी प्रार्थना केली होती. शेवटी रंगो बापूजी हे आमचे खास नेमलेले प्रतिनिधि वकील आहेत. कंपनी सरकारने आमचे राज्य नि सर्वस्व बुचाडून घेतले आहे. तेव्हा रंगोबा लंडनला असे तोवर त्याच्या निर्वाहाचा नि मोकदम्याचा सर्व खर्च कोर्टाने सामाळावा.” अशीहि मागणी केली होती.
लेखालेखी नि तोंडातोडीचे युद्ध
रंगोबाने कोर्टाला अर्ज करावे नि त्याच्या सेक्रेटरीने ‘आम्ही तुम्हाला ओळखत नाही’ असा ठरावीक साच्यांचा जबाब द्यावा. त्यावर रंगोबाचा उलट जबाब ठेवलेलाच "आम्ही तुम्हाला नाही, इतका बिनचूक जबाब देण्यापुरते तरी तुम्ही मला ओळखता याबद्दल मी आभारी आहे. पूर्वी माझे दोस्त नि मी हिंदुस्थानातून आलोच का म्हणून आम्हाला तुम्ही ओळखण्याचे नाकारलेत. आता मी हिंदुस्थानात परत गेलोच का नाही म्हणून मला तुम्ही ओळखत नाही. असली शब्दांची लपंडाव खेळण्यापेक्षा, आमच्या राजाला बदनाम करून न्याय नीति माणुसकी न पहाता, कसलीही चौकशी न करता, तुम्ही हद्दपार तर केलेच. आता त्याला नि त्याच्या हालअपेष्टाना गुपचूप गाडून दृष्टीआड सृष्टीआड करण्याचा आमचा हेतू आहे. असे स्पष्ट का एकदा सांगून मोकळे होत नाही?"
अहो तुम्ही कार्टाचे सन्मान्य मेम्बरलोक हो, तुम्ही स्वताला क्रिश्चन म्हणवता. तुमच्यापैकी बर्याचजणांची पावले आता थडग्यांची वाट चालू लागली आहेत. थोड्याच दिवसांत तुम्हाला इश्वरापुढे पाप पुण्याची झडती द्यावी लागणार माझ्या धर्मामतानुसार, तुम्ही जेव्हा स्वर्गाच्या दाराशी जाल तेव्हा तुमची सारी बदकर्मे तेथे ढिगार घालून साठविलेली आढळतील. सज्जन नि न्यायी जीवानाच स्वर्गात प्रवेश मिळतो. तेव्हा तेथे तुमची काय अवस्था होईल. याचा तरी मेहरबान, थोडा विचार करा. आज खुर्चीवर तुम्ही डायरेक्टर आहात पण काळाची झडप पडल्यावर, किड्यामुंग्यांच्या खाद्याशिवाय काय विशेष तुमची किंमत रहाणार? मी हिंदुस्थानातला एक हिंदू म्हणून माझा जागोजाग नि पदोपदी अपमान (रंगो बापूजी मालट्याहून लंडनला परत आला तो पुन्हा ओरिएण्टल बोटीनेच. बोटीवर चढून एकादा तास झाला असेल नसेल, रंगो बापूजी शिडीने- डेकवर चढत होता. इतक्यात तेथे दोन तीन गोरे अधिकारी त्याला समोर भेटले. नजरानजर होताच, त्या गोर्यानी एकाकी रंगो बापूजीवर हिंदुस्थानीतून शिव्यांची फेर झाडायला सुरुवात केली, "ए डेखो काला बदमाश आदमी टुम बदमाश, टुमारा वो राजा बदमाश.’’ रंगो बापूजीने त्याना तोंड संभाळून बोलाण्याचा इषारा देताच, ते टोपडे जास्तच खवळले. ‘‘अभि लंडनको पिछे जाटा है टुम. टुमारे वास्टे लंडनके चौकमें फाशीका खंबा खडा कर दिया है. कंपनी बहादर दुमको वोह खंबेपर फांसी डेगी, नहीं तो हकाल डेगी इंग्लंड के बाहार. मालूम है कुट्टे!" रंगो बापूजीने ही हकिगत लंडनला परत येताच प्रोप्रायटर कोर्टाला लेखी अर्जाने कळविली होती. त्याचा संदर्भ त्याने वरील जबाबात पुन्हा दर्शविला.) करायला तुमचे सरकारी नोकर धजावतात. जणू काय, आमचा अवमान नि हेलणा करायचा तुम्हाला परमेश्वरी दाखलाच मिळाला आहे. तुम्ही आमचा हवा तो छळ करावा, वाटेल त्या अन्यायाखाली आम्हाला चिरडावे नि आम्ही मात्र ते सारे मुकाट्याने सहन करावे. तोंडातून चकार शब्द काढू नये. अशी तुमची आज वर्तणूक आहे. ठीक आहे. काळ समर्थ आहे. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे. ‘एवरी डॉग हॅज हिज डे’ (प्रत्येक कुत्र्यालाहि सूडाची संधि मिळत असते.) ही तुमची इंग्रजी म्हणच विचारात घ्या. झाले.
चार्लस नोरीसची छत्रपतिसेवा
चार्लस नौरीस हा मुंबई सरकारचा काही वर्षे सेक्रेटरी होता. सगळे सातारा प्रकरण त्याच्या नजरेसमोर घडलेले, रंगो बापूजी त्याला भेटला. ता. १९ जून १८४२ रोजी प्रोप्रायटर कोर्टाची सभा भरली, तेव्हा नोरीसने सातारा प्रकरणावर सडेतोड भाषण करून आप्पासाहेबाची हरामखोरी, नातूचे लाच कटबाजी आणि प्रतापसिंहाचा द्वेष, ग्रामण्यावरून दक्षिणेतल्या चित्पावन भटानी राजविरूद्ध उठविलेली धार्मिक वावटळ आणि अखेर या सगळ्या राजद्रोही उठावणीचा मुंबई सरकारने केलेला पराचा कावळा. या सर्व भानगडी वर स्वच्छ प्रकाश पाडला. प्रतापसिंहासारख्या कर्तबगार, प्रजादक्ष आणि सज्जन राजाला बिनचौकशीने हद्दपार करण्यात न्यायाची तर पायमल्ली झालेलीच आहे. पण हिंदुस्थानातल्या ब्रिटिशांच्या हितसंबंधाना फार मोठा धोका निर्माण झालेला आहे, अशीहि नोरीसने सूचना दिली.
प्रतापसिंहाचे दुर्दैव की हे व्याख्यान दिल्यावर थोड्याच दिवसानी नोरीस मृत्यू पावला. त्याचे ते भाषण मुंबईच्या `बॉम्बे युनायटेड सर्विस गॅझेट अॅण्ड लिटररी क्रॉनिकल`च्या ता. १३ ऑक्टोबर १८४२ च्या अंकात प्रसिद्ध झाले. हिंदुस्थानात सगळीकडे उडाली नि मुंबई सरकारच्या घमेण्डानंदनांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या.
सबंध १८४२ साल रंगो बापूजी कोटांबरोबर लेखालेखी नि तोंडातोंडाची बेगुमान हुजत घेत राहिला. वर्तमानपत्रांत तर त्याने दर आठवड्याला सातारा प्रकरणातल्या कोणत्या ना कोणत्या मुद्यावर कंपनीच्या मुंबईकर अधिकाऱ्यांची कृष्ण कृत्ये दस्तऐवजी पुराव्यानिशी चव्हाट्यावर मांडण्याचा धूमधडाका चालवला. शिवाय, पार्लमेण्टाचे मोठमोठे लॉर्डलोक नि हाऊस ऑफ कॉमन्सचे सभासद त्याचप्रमाणे हिंदुस्थानातून सेवानिवृत्त झालेले अनेक गोरे अधिकारी यांच्या नित्य गाठीभेटी घेऊन, त्याना छापील कागदपत्र पुरऊन महाराजांवर, कंपनीच्या नोकरानी केलेल्या नि नित्य चालविलेल्या जुलूम जबरदस्तीची हकिकत सांगून, रंगो बापूजी त्यांच्या सहानुभूतीचा पाठिंबा मिळवीत सारखा भटकत असे. इंग्लंड स्कॉटलंड नि आयर्लण्डातच नव्हे, पण फ्रान्स नि पोर्च्युगालपर्यन्त, रंगो बापूजीच्या प्रचारयंत्राने तिकडील लोकमताला प्रक्षुब्ध करून सोडले. लॉर्डस नि कॉमन्स अशा दोनी संस्थांनी एक चौकशी कमिशन नेमून, सबंध सातारा प्रकरणाची निस्पृह चौकशी करावी. अधिकाराची पर्वा न करता गुन्हेगार ठरेल त्याला शिक्षा करावी, मग तो प्रतापसिंह असो अथवा गवर्नर सर जेम्स कारन्याक असो. त्याला आमची तयारी आहे, असा सारखा पुकारा रंगो बापूजी करू लागल्यामुळे कंपनीच्या कचेर्या आणि पार्लमेण्ट सारखे हादरू लागले.
इतक्यात प्रतापसिंह काशीला ज्या वाड्यात रहात होता, त्याला एकाकी आग लागून, त्यात जवळ होती ती थोडीशी मालमत्ता जळून खाक झाल्याची पत्रे येतांच रंगो बापूजीने वर्तमान पत्रांतून ठणाणा केला. अनेक वजनदार पार्लमेंट मेम्बरानीहि जाहीरपत्रे लिहून, हिंदुस्थानात हा काय प्रलय चालविला आहे या व्यापारी कंपनीच्या सरकाराने, अशी जोरदार हाकाटी चालू केली. राजाच्या या सर्वस्वनाशाला सातारचा दिवाण नातू नि ओवान्स रसिदंटच कारण आहेत. कारण राजा निर्धन अवस्थेत बाहेर पडला. त्याला दरमहा मिळणारे दहा हजार रुपये खर्चाला पुरत नाहीत, हे पुरे माहीत असताना, जो नराधम ओवान्स, राजाच्या वकिलाना हिंदुस्थानात परतण्यासाठी कोर्टाने दिलेले ४० हजार रुपये महाराजाच्या दरमहा पगारातून कापून घेण्याचा मुंबई सरकारला आग्रह करतो, तोच या आगीच्या मुळाशी असला पाहिजे, या रंगो बापूजींच्या वृत्तपत्री आरोळीला अनेक सज्जन इंग्रज स्त्री पुरुषानी जाहीर पत्रे लिहून पाठिंबा दिला.
लंडनच्या हाकाटीचे हिंदुस्थानात पडसाद
ज्या ज्या ‘नूसपेपरांत’ सातारा प्रकरणाचा मजकूर यायचा, त्याच्या प्रति खरेदी करून रंगो बापूजी काशीला महाराजाकडे आणि मुंबई पुणे सातारा येथल्या काही ठरावीक इसमांकडे बिनचूक पाठयायचा. शिवाय, मुंबईची पत्रे आपणहून पुष्कळ वेळा लंडनच्या पत्रातले असले मजकूर मुद्दाम छापायचे. त्या वेळी वर्तमानपत्रातल्या मजकुराला नि बातम्याना हिंदीलोक फार महत्त्व द्यायचे. १८४२ साली मुंबईला जॉर्ज आर्थर गवर्नर होता. त्याने ३० सप्टेंबर १८४२ चा एक खलिता लंडनच्या कंपनीबहाद्दराना पाठविला. त्यात तो म्हणतो, “सातारा प्रकरणाच्या तिकडे (लंडनमध्ये अखंड चाललेल्या पर्याचा तुमच्या सरकारच्या शीलावर धातुक परिणाम होत असला पाहिजे. परंतु त्याहिपेक्षा त्याचे पडसाद इंकडील लोकांवर विशेष विकल्पाचे (प्रिज्युडिशल) परिणाम करीत आहेत. हे आम्ही न सांगताहि आपल्याला कळण्यासारखे आहे. देशी लोकांची मने इकडे फार अस्वस्थ झाली आहेत आणि आमच्या कारभाराबद्दल, न्यायाबद्दल. जिकडे तिकडे बेभरंसा उत्पन्न झालेला आहे." या खलित्यावर टीका करताना मार्च १८४३चे ब्रिटीश फ्रेंड ऑफ इंडिया मॅगझीन म्हणते.- ‘‘राजाला बिनचौकशीने पदच्युत नि हद्दपार न करता, न्यायबुद्धीने वागविले असते तर हिंदी लोकांची मनें कशाला अस्वस्थ झाली असती? पार्लमेण्टाने कंपनीला जी सनद दिलेली आहे. तिच्यात या असल्या परिणामाची सोय लावलेलीच आहे. जनरल कोर्टाने आपले सनदी नोकर हिंदुस्थानात जर घाशीरामी गाजवीत असले, तर ती हुडकून काढली पाहिजे, उजेडात आणली पाहिजे, तिच्या धिक्कार केला पाहिजे आणि अन्यायांचे परिमार्जन केले पाहिजे. अपराधी कोणीहि मोठा असो अगर छोटा असो, नवर्याच्या प्रेतावर विधवा जाळणारा हिंदू असो, अगर हिंदी राजेलोकाना लुटणारा गोरा लुटारू असो, त्याची चौकशी होऊन भरपूर शिक्षा व्हावी, यासाठीच चळवळींचे तुफान माजवावे लागते.’’
रंगो बापूजीचे पहिले व्याख्यान
प्रत्येक अर्जाला जरी कंपनीच्या अधिकार्यानी धुडकावून लावले, तरी डायरेक्टरांच्या नि प्रोप्रायटरांच्या ज्या ज्या वेळी इंडिया हाऊसमध्ये सभा भरत असत त्या त्या वेळी रंगो बापूजी हटकून टिपला तेथे घुसून हजर असायचा. बेधडक आत जाऊन खुर्चीवर बसायचा, विलायतेतले एकंदर वातावरण बरेच गरम झालेले पाहून, या लाल पागोट्यावाल्याची दखल घेतल्याशिवाय सुटका नाही, असे ठरवून, ता. ८ फेब्रुवारी १८४३ बुधवाराच्या जनरल कोर्टाच्या स्पेशल सभेत बोलण्याची रंगो बापूजीला विनंती करण्यात आली. विनंती होताच, तडाड रंगो बापूजी उठला. हातात ना कागदाचे चिठोरे, ना मुद्दे, ना काही. सगळा इतिहास तोंडपाठ. मात्र या वेळी, तो जरी रोजच्या संभाषणात बेसिक इंग्रजीच्या तोलाचे इंग्रजी बोलू शकत असे, तरी व्याख्यान देण्याइतकी इंग्रजीची तयारी त्याची नव्हती.
परंतु आजूबाजूला मराठी भाषा बोलणारे व जाणणारे मेजर ग्रॅहाम नि कॅपटन कोगन हजर असलेले पाहून रंगोबाने एकदमम मराठीतच आपल्या भाषणाला सुरुवात केली. खाडकन ग्रहामसाहेब बाजूला उभे राहिले. रंगोबाने चारपाच वाक्ये उच्चारली का लगेच ग्रॅहामसाहेब त्यांचे इंग्रजीत भाषांतर करून साभिनय सांगत. या एक तासाच्या रंगोबाच्या व्याख्यानाविषयी, मार्च १८४३ चे ब्रिटीश फ्रेण्ड ऑफ इंडिया मॅगझीन म्हणते.- "हिंदुस्थानविषयी चर्चा करणारे पार्लमेण्टचे सर्वसाधारण अधिवेशन भरायचे म्हणजे ३ महिन्यातून एकदा नि तेहि फक्त एकच तास, आम्ही तुमच्यावर राज्य करीत आहोत, हे दाखविण्यासाठी हिंदी लोकांची ही नुसती भुलभुलावणी आहे. चालले आहे ते राज्य का लुटालूट, हे दिसतेच आहे सगळ्याना पण आता कंपनीच्या अरेरावी कारभाराचे चिरडून भुसकट पाडणारा वाफेचा रूळ चालू झाला आहे आणि हिंदी लोकांवर चाललेल्या जुलूम जबरदस्तीची काळीकुट्ट कर्म इंग्लंडच्या जनतेसमोर मांडली जात आहेत.’’
काहीहि असो, हिंदुस्थानाच्या या नकली राज्यकर्त्या पार्लमेण्टापुढे आपल्या छत्रपति धन्याबाबत बोलण्याचा हक्क वकील नात्याने रंगो बापूजीने अखेर मिळवला. आवेशाने त्वेषाने स्वाभिमानाने आणि संतापाने तो काही वाक्ये बोलतो आहे आणि त्याचे झटकन इंग्रजी भाषांतर होत आहे, असा प्रकार चालला. तो म्हणाला. `कंपनी सरकारने माझ्या धन्याला न्याय द्यावा, तो मागण्यासाठी मी येथे आलो, पण मला डारेक्टर कोर्टात येण्याचीच बंदी केली, इतकेच नव्हे, तर माझा पदोपदी ठिकठिकाणी अपमानहि करायला हे लोक चुकले नाहीत.`
या व्याख्यानविषयी W. B. H. सहीने एका लेखकाने याच मासिकात एक पत्र लिहिले. त्यात तो म्हणतो.- ‘‘सातारच्या दुर्देवी राजाची कहाणी ८ फेब्रुवारीला चर्चेला निघाली नि तेथे रंगो बापूजीला बोलण्याची संधि मिळाली हे छान झाले. पण तो आपल्या-मातृभाषेत-मराठीत बोलला, हे काही ठीक झाले नाही. दुभाष्याच्या इंग्रजी भाषांतरात मूळ भाषेचा जोर नि आवेश उमटणे शक्य नव्हते. या लीडन स्ट्रीटच्या लोकांना दुक्खी घायाळ झालेल्या फिर्यादी लोकांची काय पर्वा? साताराच्या राजाविषयी चर्चा निघून त्यात लंडनच्या नि हिंदुस्थानच्या आपल्या सरकारांची बिंगे चव्हाट्यावर येताहेत, एवढ्यानेच चेअरमनसाहेब अस्वस्थ होऊन गेलेले दिसले. इतर प्रोपायटरांच्या भाषणाना, राजाच्या इंग्रेज मित्रांच्या सवालाना चेअरमनने एका शब्दाने तरी काही उत्तर दिले काय? मग बिचार्या रंगो बापूजीच्या भाषांतरीत व्याख्यानाची काय दशा! ही भाषणे ऐकणार्या त्या २४ अधिकाऱ्याना खरोखरच काही सत्ता असती तर त्यांनी रंगो बापूजीला खडी फोडायलाच पाठवून दिला असता. वास्तवीक रंगो बापूजीला बोलून कसा दिला, याचे मला आश्चर्य वाटते. हो, पण मुंबई सरकारच्या कारमान्याने बरे केले किंवा वाईट केले, खर केले का खोटे केले, त्याचा कस्सूर पुरस्कारच करायचा, असा जेथे कोर्टाच्या बड्या अधिकान्यांचा निश्चय झालेला, तेथे त्या एकतासी लुटुपुटूच्या पार्लमेण्टरी सभेत एकादा काळा आदमी बोलला काय अथवा गौरा असामी कडकडला काय, त्याना काय त्याची खिजगणती? थोडक्यात बोलून, या महाशयांच्या भोजनाला जाण्याला त्याने उशीर केला नाही, म्हणजे झाले.’’
पार्लमेण्टरी कागद छपाईचा परिणाम
सातारा प्रकरणाबाबत मुंबई कलकत्ता सरकारातून मागविलेले यच्चावत उघड गुप्त ठरावांचे, सूचनांचे आणि हुकुमांचे कागद, आणि रंगो बापूजीने स्वता पैदा करून कोर्टाला दिलेले महत्त्वाचे कागद, पार्लमेण्टाकडून पुस्तकांच्या रूपाने छापविण्यात रंगो बापूजीची चळवळ आणि वृत्तपत्री हाकाटी पुष्कळच परिणामकारक झाली. ती पुस्तके बाहेर पडताच, ठकबाज्या, कटबाज्या, लबाड्या, जुलूम, हिंसा घातपात आणि जबरदस्त्यांचे शेकडो प्रकार उजेडात आले. विचारवंत इंग्लिश जनतेपुढे ईस्ट इंडिया कंपनीच्या या रावणशाही प्रदर्शनाने कंपनी बदनाम झाली. सातारच्या राजाच्या बाबतीत कंपनीच्या नोकरांनी इंग्लंडच्या नावाला काळीमा लावणारी लाजीरवाणी दुष्कृत्ये केली. म्हणूनच कंपनीला आपला सरकारपणाच्या व्यापाराचा शेवटचा गाशा गुंडाळावा लागला, असेच आंग्ल बखरकाराना अखेर कबूल करणे भाग पडले. हिंदुस्थानावर राज्य करायला जाणारे गोरे अधिकारी म्हणजे `केवळ अधाशी गिधाडे` असे बर्कने केलेले त्यांचे वर्णन या सातारा प्रकरणात अक्षरशः सत्य ठरले. प्रोप्रायटर नि डायरेक्टर कोर्टाच्या अरेरावी अधिकाऱ्यांविरुद्ध खुद इंग्लिश जनतेने ‘शेम शेम’च्या आरोळ्या मारण्याइतके तेथले लोकमत रंगो बापूजीने गरम करून सोडले, हा काय त्याचा लहानसहान विजय म्हणायचा?
प्रकरण २५ वे
भारत-सेवक जॉर्ज थॉमसनची कामगिरी
सध्या थोडा वेळ रंगो बापूजीला जोसेफ ह्यूम नि फोर्ब्स प्रभूति मंडळीबरोबर बातबेत ठरविण्यात गुंग ठेऊन, आपण जरा सातारा नि काशी येथील वातावरणाचा अहवाल पाहिला पाहिजे. बाळाजीपंत नातू दिवाणबहादूर सातार्याचे अधिकारी असल्यामुळे,
ब्राम्हणी राज्य कैदवार एकापरिस एक मसलती ।
वाड्यांत भटांची खलबत दिवाण नातूचि चढती रती ।।
असा मामला झालेला होता. प्रतापसिंहाचे हजार बाराशे पक्षपाती सातारा सोडून सहकुटुंब सहपरिवार महाराजाबरोबर काशीच्या वनवासाला गेले होते. जे कोणी मागे राहिले, त्यांचा नातूने पक्का काटा काढून, भिकेला लावले, चिटणिसांच्या वतनांची नि घरादारांची जप्ती करून, त्यांच्या संग्रहीचे सगळे जुने कागद जाळून टाकले, बळवंतराव मल्हारला रोज पुरा एक रुपया पोटगी देऊन पुण्याला ठाणबंद करून ठेवलाच होता. गोविंदराव दिवाणाची अन्नान्न दशा झाली होती. सेनाकर्ते दिनकरराव मोहिते याला गोविंदराव दिवाणाच्या बरोबर अटक झाली होती. कैदेत त्याचा पुष्कळ छळ केला पण तो नातू ओवान्सच्या सांगीला बधला नाही. म्हणून त्याला जन्मठेप सातार्यालाच छावणीच्या कैदेत ठेवला होता, खजिन्याच्या खोलींत बसून खोटे बनावट दस्त करून त्यावर जवाहीरखान्यातले शिक्के उठविणारा आप्पा शिंदकर याला प्रतापसिंहानेच कैद केले होते.
वास्तविक तो नातूचा पक्षपाती पण पुढे त्याने प्रतापसिंहाला आपल्या सर्व कटबाज कंपूचे कबुली जबाब लिहून देवविले होते. राज्यक्रांति झाल्यावर आपली सुटका होईल, अशी शिंदकर, जानू भंडारी वगैरे कटबाजाना मोठी आशा होती. त्यानी आप्पा छत्रपतीला अर्ज केले. ‘ज्याने तुम्हाला कैदेत टाकले. त्याला सुटकेचे अर्ज करा’, असे छद्मी जबाब त्यांना मिळाले. प्रतापसिंहाला लिहून दिलेल्या जबान्या खोट्या आहेत, असे लिहून द्या, म्हणून नातूने त्याना बरेच दिवस पोलिशी समजुतीने सांगितले. अखेर मारहाणीने फुकट मरण्यापेक्षा, सगळ्यानी तशा जबान्या लिहून दिल्यावर त्यांच्या सुटका झाल्या. ठरलेल्या बक्षिसांच्या रोख रकमा नि जहागिर्या गेल्या हवेत उडत नि हे सारे प्रतापसिंहद्रोही गेले भीक मागत देशोधडीला.
रवळोजी नाईक कासकर ओवान्सच्या हुकमाने अटक झाला होता. प्रतापसिंहाने इंग्रजाना हुसकावण्याचे कट केलेले मला माहीत आहेत, असे त्याने लिहून द्यावे, म्हणून रोज त्याला तुरुंगात मारहाण करण्यात येत असे. मी प्राण गेला तरी खोटे सांगणार नाही. लिहून देणार नाही. हे सारे तुम्ही दोघानी (नातू ओवान्सनी) आमच्या महाराजाविरुद्ध नुसते कुमांड उभे केले आहे, असे रवळोजी सतत २ वर्षे निर्धाराने सांगत होता. त्याचा फार छळ करण्यात आला. अखेर अशक्त खंगलेल्या लंजूर अवस्थेत सोडून दिला. घरी येऊन पहातो तों तेथेहि सगळी वाताहात लागलेली. यशवंतराव फौजदाराच्या काचाने बायकाने जीव दिला होता. उपासाने पोरे मेली होती. वृद्ध बाप एकटा शिल्लक होता. थोडयाच दिवसात रवळोजी एकाकी नाहीसा झाला. नाहीसा झाला, का कोणी नाहीसा केला, हे गूढ उकललेले नाही.
‘नातूच्या छळाला कंटाळून केवळ जीव वाचवण्यासाठी प्रतापसिंहाला लिहून दिलेले कबुलीजबाब खोटे आहेत, असे आम्ही लिहून मोकळे झालो आहो, तरी महाराजापुढे दिलेल्या जबान्याच ईश्वरसाक्ष खर्या आहेत, तसे तुम्ही लंडनच्या साहेबाना कळवावे,’ असे आप्पा शिंदकराने यशवंतराव शिर्क्याला ता. २४ मे १८४० ये पत्र लंडनला पाठविले. रवळोजीच्या म्हाताऱ्या बापाने काशी येथे महाराजाना हकिकत लिहून कळविली. ती महाराजानी ता. १ मे १८४२ च्या पत्राने रंगो बापूजीकडे लंडनला पाठवून दिली.
सातारा दरबारचा आप्पासाहेबी मामला हा असा झालेला होता. नातूची सर्वाधिकारशाही म्हणजे पेशवाई सैतानशाहीचा नवा परशुरामावतारच बनली होती. नातूच्या महाकृपेने आप्पासाहेब भोसला छत्रपति बनला, तरी थोडयाच दिवसांत नातूची चित्पावनी कुरघोडी त्यालाहि जाचू लागली. जिवाभावाचा कोणीतरी पाठीशी असावा म्हणून आप्पासाहेबाने खंडेराव मामा शिर्क्याला आपला सारा कारभार सोपविला होता. हे मामा इरसाल मामाच होते. प्रतापसिंहाच्या वेळी मामा त्याच्या पट्ट्यात. प्रसंग येताच मामानी फिरवली पगडी नि शिरले आप्पासाहेबाच्या कटात, आता तर-
हमें आगटे महाजनि नृपमातुल खंडरावजी शिरके ।
या विरहित दरबारी अन्य जनाचा कधीं न पद शिरके ।।
या त्या काही सर्वतोमुखी झालेल्या आर्येप्रमाणे अवस्था झालेली होती. मामांच्या लहरीचे नि मिजाशीचे धरण ओलांडून लोकांच्या तक्रारी अधिकार्याच्या कानापर्यंत पोहचणेच दुर्घट होऊन बसले होते.
बाळाजीपंत नातूच्या नावाने हातबोटे मोडून त्याला शिव्या देणारे शेकडो चित्पावन अलिकडे आढळतात. प्रतापसिंहाच्या सत्यानाशाचे खापर ते एकट्या नातूवर फोडून मोकळे होतात. पण ते एक महत्वाचा मुद्दा डोळ्याआड करतात. त्या काळच्या यच्चावत चित्पावन जातभाईनी नातू निळकंठ धरते, चिंतामणराव सांगलीकर याना आपला संघटीत हुकमी पाठिंबा दिला नसता, तर या एकेकट्या माकडांची काय तोंडे होती इतक्या अनन्वित राक्षसी लीला करण्याची? सारांश, नातू सांगलीकरादि नराधम हे तत्कालीन चित्पावन समाजात भडकलेल्या तिरस्करणीय नृशंसतेचे प्रतीकच होते, असा सिद्धांत निघाल्याशिवाय रहात नाही.
चला आता काशीला जाऊ
प्रतापसिंहाच्या काशीच्या बंदिवासाने सेण्ट हेलेना बेटावर हद्दपार करून ठेवलेल्या फ्रान्सच्या नेपोलियन बोनापार्टाची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. दोघेहि लोकप्रिय सत्ताधीश आंग्रेजांच्या कुटील नीतीला बळी पडलेले, अमानुष हालअपेष्टांबद्दल दोघेहि सारखेच चरफडत होते. दोनहि ठिकाणची हवा त्या दोन पुरुषोत्तमांच्या आयुष्याला दररोज कणकण झिजवीत होती. आपल्या चारित्राचे नि चारित्र्याचे आंग्रेजानी उडविलेले धिंडवडे दोघांच्याहि काळजाना करपवीत होते. सेण्ट हेलेना बेटावर नेपोलियन निदान एकटा एक जीव होता. पण प्रतापसिंहाच्या आवती भवती हजार बाराशे एकनिष्ठ सेवकांची गचडी पडलेली होती नि त्याला मिळणार्या अपुर्या नेमणुकीच्या पैशाने तेवढ्यांची दोनप्रहर त्याला साजरी करणे भाग होते. एक मात्र भेद होता. नेपोलियनचा जेलर मूर्तिमंत राक्षस होता. तो सारखा त्याला शिव्या द्यायचा. पाणउतारा करायचा. हवे ते अमानुष छळ करून फ्रान्सच्या त्या राष्ट्रवीराला रडकुंडीला आणयचा.
प्रतापसिंहाच्या नशिबाने मेजर कारपेण्टर हा मोठा सज्जन इंग्रज त्याला लाभला होता. त्याने एकंदर परिस्थितीचा झटपट आढावा काढून, प्रतापसिंहाच्या अधोगतीचा सहानुभूतीने अभ्यास केला आणि महाराजाना नि त्यांच्या परिवाराला आदराने नि चांगुलपणाने वागविण्याचा क्रम ठेवला. थोड्याच दिवसांत त्याने प्रतापसिंहाचा बंधुवत् विश्वास संपादन केला. सातार्याहून सुटलेली चिथावणीची पत्रे वरिष्ट अधिकान्यांकडून आली, तरी न्यायचातुर्याने एकतर तो ती रद्दीत काढायचा, किंवा समर्पक उत्तरे देऊन फेटाळून लावायचा. महाराज शोकाकूल झाले, निराशेने व्यग्र झाले किंवा त्याना काही अडचण पडली, तर मेजर कारपेण्टर लगेच त्याना स्वता धीर द्यायचा आणि सोडवणूक करायचा. त्याच्यासारखा कनवाळू अधिकारी लाभल्यामुळेच प्रतापसिंहाला आपली लंडनची डाक बिनबोभाट चालू राखता आली आणि मुंबईच्या काही ठरावीक सावकारी पेढ्यांकडून कर्ज काढण्यांची सोय लावता आली.
लंडनहून महाराजांना येणारी रंगो बापूजीची सर्व पत्रे मेजर कारपेण्टरच्या नावानीच येत असल्यामुळे वाटेत ती फोडून पहाण्याची मुंबई किंवा कलकत्ता सरकारच्या गुप्त हेराना छाती होत नसे. काशीला यशवंत मल्हार चिटणीस महाराजांच्या चिटणिशी कामावर होता. त्याचे नि कारपेण्टरचे सूत अगदी जिव्हाळ्याचे जमलेले होते. स्वता कारपेण्टरहि थोड्याच दिवसांत मराठी छान बोलू लागला. त्यामुळे महाराजांची मराठी पत्रे इंग्रेजीत भाषांतर करण्याचीहि कामगिरी तो स्वतः अगत्याने करीत असे. प्रतापसिंहाच्या असंख्य आधीव्याधींच्या सहारा वाळवंटात मेजर कारपेण्टरचे निकट सांनिध्य हे एकच ‘ओयासीस’ (एक दोन झाडांच्या सावलीतले झर्याचे ठिकाण) होते.
पैशाच्या बाबतीत प्रतापसिंहाची अवस्था भयंकर अडचणीची होऊन बसली होती. दरमहा दहा हजार मिळायचे त्यात नुसत्या परिवाराचे पोटहि भागे ना. तशाच रंगो बापूजी लंडनला उलाढाल्या करीत बसलेला. त्याच्याहि खर्चाचे तोंड अखंड उघडे, एक वेळा ब्रेड पाणी चघळून दिवस काढले, तरी प्रचारकार्याला पैशाचे पाठबळ नसेल तर काय होणार? अखेर महाराजानी मुंबईच्या आपल्या जुन्या ओळखीच्या सावकारी पेढ्यांवर पत्रव्यवहार करून रंगोबाला परस्पर वेळोवेळी रकमा पाठविण्याची व्यवस्था लावली. माल्टाहून तो परत लंडनला गेला त्यावेळी महाराजांची पत्रे आणि मुंबईची हुंडी आलेली होती. केवळ पोटाला लागेल तेवढाच खर्च करून बाकीच्या रकमा पुस्तके, हस्तपत्रिका समांचे कार्यक्रम, या प्रचारकार्याला आणि मोकदमा लढवण्यासाठी मिळविलेल्या काही प्रचारपटू नि कायदेपंडीत इंग्रजांच्या तनख्याला रंगोबा खर्च करीत असे. माल्टाहून परत गेल्यानंतर रंगोबा लंडनमध्ये बहुतकरून पायीच फिरत असे.
गाडीघोड्याचा खर्च त्याला झेपतच नसे. शिर्क्याच्या वेळी उंची गाड्यातून फिरणार्या वकील मंडळातला हा शिलकी असांगी पायी भटकताना पाहून, पुष्कळाना चमत्कारीक वाटायचे. एकदा एका डायरेक्टराने त्याला विचारलेच. "मिस्टर रंगोबा, तुम्ही तर हिज हायनेस सातारा राजाचे वकील आणि अशी पायपिटी करणे शोभत नाही तुम्हाला." त्यावर हजरजबाबी रंगोबाने ताडकन उत्तर दिले.- "आमचा हिंदूंचा बादशहा पदच्युत नि हद्दपार करताना तुमच्या मुंबई सरकारने काय नीति पाहिली? तुम्हाला कसलाहि हक्क नसताना आमच्या राजाला तुम्ही मातीमोल केले. तर मग त्याच्या गरीब वकिलाने लंडनची धूळ तुडवली तर त्यात तुम्हाला काय एवढे चमत्कारीक वाटावे?"
सन १८४०त रंगो बापूजी लंडनला येताच, त्याने प्रथम हौस ऑफ कॉमन्सचे एक वजनदार मेम्बर नि प्रभावी मुत्सद्दी जोसेफ हयूम आणि जॉर्ज थॉमसन या दोन भारतप्रेमी इंग्रेज गृहस्थांचे पाठबळ मिळवले. पैकी जॉर्ज थॉमसन याला रंगोबाने रोख तनखा देऊन, सातारा प्रकरण लढवायला हाताशी धरले होते. पण थॉमसन हा इतर पोटार्थी बालिष्टरांसारखा किंवा भिक्षुकांसारखा केवळ दक्षणेसाठी मंत्र म्हणणारा नव्हता. तो जातिवंत भारतप्रेमी होता. त्याने सातारा प्रकरणांत पार्लमेण्टला धरणीकंपाचे धक्के तर दिलेच दिले. पण पुष्कळाना माहीतहि नसेल- हिंदुस्थानात स्वराज्याची जी चळवळ आज खुद ब्रिटिशांना ‘छोडो हिंद’ म्हणून धमकावीत आहे आणि तेहि लेकांचे ‘हम जाते है’ म्हणून गेलेसुद्धा त्या चळवळीचे प्रथम बीजारोपण करण्यात जॉर्ज थॉमसन साहेबांचे परिश्रम कारण झाले आहेत. म्हणून या धीर इंग्रज चळवळ्याचा या प्रकरणात सारांशाने परिचय करून देणे अगत्याचे आहे.
थॉमसनचा हिंदुस्थानाविषयी जिव्हाळा
बाबू द्वारकानाथ टागोर यानी कलकत्त्याला सन १८३८ साली लॅण्ड-होल्डर्स सोसायटी स्थापन केली. एडमण्ड बर्कच्या जागेवर आलेले लॉर्ड रूम हेहि एक हिंदुस्थानचे मोठे दोस्त होते. त्यानी १८३९ साली लंडनमध्ये ब्रिटिश इंडिया सोसायटी काढल्याचे मागे सांगितलेच आहे. या दोन संस्थांचे हितसंबंध एकच असल्यामुळे, त्यांचा विचारविनिमय अखंड चालू असे. अर्थात द्वारकानाथ टागोर आणि लॉर्ड रूम हे दोनहि संस्थापक लंडनमध्ये एकत्र भेटल्यावर, हिंदुस्थानाविषयी अतिशय जिव्हाळ्याचा विचारविनिमय झाला. जॉर्ज थॉमसन हा लंडन संस्थेचा एक उत्साही कार्यकर्ता असल्यामुळे, त्याची नि टागोराची दोस्ती जमली. सातारा प्रकरण या वेळी (१८४२) विलायतेच्या वातावरणात धरणीकंपाचे स्फोटावर स्फोट उडवीत असल्यामुळे आणि थॉमसनच त्या स्फोटांचा मुख्य सुरूंग्या असल्यामुळे, टागोराने त्याला हिंदुस्थानला आणि प्रतापसिंहाला भेट देण्याचा आग्रह केला. दोघे एकाच बोटीतून १२ डिसेम्बर १८४२ रोजी मुंबईला आले.
कान आणि डोळे यांत अवघे चारच बोटांचे अंतर असते. थॉमसनने हिंदुस्थानाविषयी पुष्कळ ऐकले होते, वाचले होते आणि कल्पनांचे स्वप्नरंजनहि अनुभवले होते. पण मुंबईच्या धक्क्यावर पाऊल ठेवताच ती सारी ऐकलेली नि वाचलेली सृष्टी प्रत्यक्ष दृष्टीला पोकळ नि फोल दिसली. व्याख्याने दिली. "तुम्ही सगळे अधिकारी कटबाज, कारस्थाने करणारे आणि लांच खाणारे आहात, असा मी तुमच्यावर जाहीर आरोप करतो." असे त्याने मुंबई सरकारच्या गवर्नरादि अधिकार्याना जाहीर व्याख्यानांत आव्हान दिले. ‘‘हिम्मत असेल तर माझ्यावर खटला करा, मग मी दाखवतो माझा काय इंगा आहे तो.’’ पण मुंबई सरकार गुपचीप मूग गिळून स्वस्थ बसले. नंतर थॉमसन कलकत्ता येथे गेला. तेथे त्याच्या व्याख्यानाना बंगाली तरुणांची अगदी झुंबड उडायची, डिमांस्थेनीस, सिसेरो, चॅथाम बर्क आणि रूम यांच्या परंपरेला उज्वल करणारे थॉमसनचे वक्तृत्व ऐकून बंगाली तरुणांत नवजीवनाचा संचार झाला.
यावच्चंद्रदिवाकर हिंदुस्थान ब्रिटिशांचा गुलामच रहाणार का स्वतंत्र होणार? या थॉमसनच्या सवालाने बंगालची सारी विचारवंत जनता थरारून गेली. अखेर ताराचंद चक्रवति, चंद्रशेखर देव, रामगोपाळ घोष, दख्खनारंजन मुकर्जी प्यारेचंद मित्र, शामचरण सेन या थोर थोर पुढाऱ्यांच्या सहाय्याने ता. २० एप्रिल १८४३ रोजी जॉर्ज थॉमसनने कलकत्त्याला ब्रिटीश इंडिया सोसायटीची शाखा स्थापन करून, इंडियन नॅशनल काँग्रेस आज ज्या विचारप्रणालींची पुरस्कर्ती म्हणून गाजत आहे, त्या विचारांचे बीजारोपण करण्याचे अजरामर श्रेय त्याने मिळवले. हिंदुस्थानातली दुराग्रही गोरी नोकरशाही आणि क्रिस्ती मिशनरी संस्था यांचे सगळे पाप चव्हाट्यावर मांडून, हिंदी लोकांना सावधानतेचा इशारा देणारा जॉर्ज थॉमसन हाथ पहिला इंग्रेज असल्यामुळे नोकरशाही नि मिशनरी त्याला थॉमसन द ग्रीव्हन्स-मॉगर (कटकट्या थॉमसन) म्हणून त्याच्या नावाने हातबोटे मोडू लागली.
थॉमसन प्रतापसिंह भेट
थॉमसनने मुद्दाम काशीला जाऊन प्रतापसिंहाची दोनदा मुलाखत घेतली. एकदा १६ जून आणि नंतर २१ नवंबर १८४३ रोजी या मुलाखतींचा साद्यंत रिपोर्ट ब्रिटीश फ्रेण्ड ऑफ इंडिया मॅगझीनच्या मे १८४४ च्या अंकात छापला होता. मेजर बसू यांच्या स्टोरी ऑफ सातारा पुस्तकाच्या परिशिष्टात तो समग्र दिलेला आहे. त्याचा सारांश येथे देत आहे. मॅगझीनच्या संपादकाने प्रतापसिंहाच्या राज्यकर्तृत्वाचे चलाख बुद्धिमत्तेचे, आणि सत्यासाठी त्याने पत्करलेल्या अघोरी वनवासाचे रसभरीत वर्णन करून, "ही महत्वाची मुलाखत आमच्या वाचकांपुढे ठेवण्यात आम्ही काही गुन्हा करीत आहोत असे आम्हाला वाटत नाही. प्रतापसिंहाची आजची काय अवस्था आहे. याचे थोडक्यात केलेले हृदयस्पर्शी निवेदन वाचून, या देशातल्या (इंग्लंड) न्यायप्रेमी जनतेचे अंतःकरण थरारून उठेल आणि सध्या भयंकर आपत्तीत पडलेल्या या हतभागी राजाच्या मुक्ततेसाठी ती आणखी जोराच्या खटपटीला लागेल, अशी आम्हाला आशा आहे" अशा प्रस्तावानंतर मुलाखतीचा मजकूर दिलेला आहे.
थॉमसन लिहितो– “मेजर कारपेण्टरच्या बंगल्यातच माझा मुकाम होता. तेथेच महाराजाची नि माझी तीन तास मुलाखत झाली. मेजर कारपेण्टरनेच दुभाष्याचे काम केले. माझे बोलणे राजाला समजावून सांगायला कारपेण्टर फार श्रम घेत होता. मला पहाताच राजाला फार आनंद झाला आणि तो मला कडकडून भेटला. विलायतेमध्ये मोकदम्याविषयी खटपट करणाऱ्या सर्व इंग्रज मित्रांचे त्याने आभार मानले. आपल्याबरोबर त्याने शेकडो कागदांची बांधीव पुस्तके आणली होती आणि मजकूर समजावून देताना तो भराभर त्या पुस्तकांतून संदर्भ काढून दाखवीत होता. अत्यंत सत्यनिष्ठेच्या आविर्भावाने राजाने एकेक गोष्ट मला उघड मनाने समजावून दिली. त्याच्या वाणीत आवेश होता. त्याच्या हृदयाला खोल जखम लागल्याप्रमाणे तो आपल्या विरुद्ध आणलेल्या अनेक आरोपांचे सात्विक त्वेषाने भराभर खंडन करीत होता. प्रत्येक मुद्दा, आंत बाहेर काहीहि न ठेवता, राजा अगदी सरळ सरळ सांगत होता.
काशीची हवा आपल्याला मानवत नाही. त्यामुळे दिवसेदिवस प्रकृति खालावत चालली आहे. सेनापतीच्या मुलाचे लग्न सातार्याला जाऊन उदेपूरच्या राजघराण्यातल्या एकाद्या राजकन्येशी व्हावे. एवढीच माझी इच्छा आता राहिली आहे, असे तो डोळ्यांत आसवे आणून म्हणाला. जन्माचे सोबती बळवंतराव चिटणीस स्थानबंदीच्या हालअपेष्टात खंगून नुकतेच वारले. आमचाहि काळ आता जवळ आला आहे. हे सांगताना राजाचा कंठ दाटून आला. काशीला सरासरी बाराशे लोक राजावर अवलंबून आहेत... प्रतापसिंह संपूर्ण निर्दोष आहे, अशी माझी बालंबाल खात्री पटली. त्याचा स्वभाव फार मनमोकळा. ‘माझी उघड चौकशी व्हावी, साप साप म्हणून भुई धोपटू नका’ हे त्याचे अट्टहासाचे म्हणणे तो सारखे उच्चारीत होता. माझ्या बारा महिन्यांच्या हिंदुस्थानच्या सफरीत मला नाना तऱ्हेने हिंदी लोक भेटले, पण प्रतापसिंहासारखा सज्जन नि सच्छील गृहस्थ त्याचा तोच, असे मला आढळून आले”.
थॉमसनने मेजर कारपेण्टरविषयी धन्योद्गार काढले. कर्तव्याची काटेकोर कमाल मर्यादा संभाळून तो राजाशी मोठया आदराने नि स्नेहभावाने वागत असलेला पाहून, थॉमसनने त्याचे मनसोक्त आभार मानले.
सन १८४४ च्या फेब्रुवारीत थॉमसन लंडनला परत येताच, त्याने कमाल हिरीरीने सातारा प्रकरणाची झोड उठवली. यापूर्वी जोसेफ ह्यूम, फोर्ब्स वगैरे मंडळीनी रंगो बापूजीच्या सहायाने चळवळ चालूच ठेवलेली होती. इंग्रजी वृत्तपत्रांतून थॉमसनने लेखांवर लेख लिहून रसिदंट ओवान्सवर लांच घेतल्याचे उघड आरोप केले. मुंबई सरकार तर लांचलुचपतीच्या भानगडीने डागळून नासलेले आहे, असा त्याने उघड ओरडा चालू केला एकामागून एक भराभर अस्सल पुरावे जाहीर करून, कंपनीच्या गोर्या नोकरशाहीने हिंदुस्थानात चालविलेल्या बेताल घाशीरामचे आणि कृष्ण कृत्यांचे पर्वत त्याने इंग्लंडच्या जनतेपुढे उभे केले. इतक्यात ओवान्स इंग्लंडात परत आला. त्याला थॉमसनने आपल्या, अनेक जाहीर व्याख्यानांचे नि वर्तमानपत्री लेखांचे पुडके पाठवून, ‘छाती असेल तर मी तुझ्यावर केलेल्या या आरोपांचे खंडण करायला जनरल कोर्टापुढे उभा रहा’,असे त्याला आव्हान दिले.
१९ मार्च १८४५ रोजी प्रोप्रायटरांची सभा भरली. त्या वेळी थॉमसनने जळजळीत व्याख्यान देऊन "मी तुमच्यावर हे शेकडो भयंकर आरोप जाहीर रीतीने केले आहेत. आज करीत आहे. तुम्हाला नि तुमच्या नि तुमच्या हिंदवी सरकारच्या अब्रूची चाड वाटत असेल, तर माझ्यावर खटला भरा. तुम्हाला पुरून उरायला मी समर्थ आहे." असे दणदणीत आव्हान दिले. ओवान्सलाहि त्याने कार्टामार्फत समन्स पाठवून आपल्यावरील आरोप खोटे आहेत, हे सिद्ध करण्याचे आव्हान दिले. १८ जून १८४५ ला पुन्हा सभा भरली. ओवान्सला मुद्दाम बोलावणे पाठवण्यात आले पण तो आला नाही.
मि. जोसेफ ह्यूम साहेबाच्या खटपटीने सातारा प्रकरण यापूर्वीच पार्लमेण्टात नेऊन भिडविले होते. कंपनीची कोर्ट नि बोर्ड जर या प्रकरणात लक्ष घालीत नाहीत, तर हा सारा धिंगाणा पार्लमेण्ट मुर्दाडाप्रमाणे पहात स्वस्थ बसणार काय? असा स्पष्ट सवाल ह्यूम साहेबानी हौस ऑफ कॉमन्सपुढे टाकला होता. ओवान्स आणि नातू यानी लांच घेऊन जी अनन्वित कृष्णकृत्ये केली, कटांच्या उठावण्या केल्या, खोटे फितूरी कागद तयार करविले, यांचा तपास व्हावा, असा अर्ज करण्यात आला. (२६-२-१८४५) जहागीरदार आणि इतर लोक यांच्याकडून नातूने लक्षावधि रुपयांच्या रकमा लांचादाखल घेऊन, स्वतः च्या नि आपल्या हस्तकांच्या तुंबड्या भरल्या. नातूने रेसिडेन्सी कचेरीतील बाळाजी काशी किबे, आबा जोशी वगैरे कारकुंडांच्या मदतीने खोटे कागदपत्र नि शिक्के तयार करपून निरनिराळ्या भरंसाट कटांच्या उभारण्या केल्या. या विषयी भरपूर पुराव्यांसह फिर्याद पार्लमेण्टपुढे मांडून, प्रतापसिंहाचा सध्या चालू असलेला छळवाद तात्काळ बंद पाडावा, अशी थॉमसनने सभेला विनंती केली.
प्रतापसिंहावरील सगळ्या आरोपांचा डोल्हारा एका नातूच्या साक्षीवर उभारलेला आहे. त्याची साक्षसुद्धा गुप्तपणाने घेण्यात येऊन ती गुप्तच राखण्यात आली. त्याची किंवा राजाविरुद्ध किटाळे उठविणार्या अनेक हरामखोरांची उलट तपासणी करण्याची राजाला एकदाहि संधि देण्यात आलेली नाही. सगळा मामला एकतर्फी उरकून घेण्यात मुंबई सरकारसुद्धा नातू-ओवान्सच्या पातकांचे वाटेकरी आहे, असा स्पष्ट खुलासा थोमसन ह्यूम प्रभृति मंडळीने केला. राजाचे डोके ठिकाणावर नाही. या मुद्यावर जुना रसिंदट कर्नल रॉबर्टसन याने लिहून पाठविले होते की, ‘`हा मुद्दा मूर्खपणाचा आहे. कारभाराची नि इन्साफाची कामे करण्यात प्रतापसिंहाइतका हुशार गृहस्थ माझ्या पाहण्यात दुसरा नाही. त्याची सत्यनिष्ठा नि निर्मळ आचरण हे गुण अनुपम आहेत.’’ तो दाखला पार्लमेण्टापुढे हजर करण्यात आला.
हे पार्लमेण्टरी वादविवाद इतक्या त्वेषाने आणि कंपनीच्या मुंबईकर अधिकान्यांविरुद्ध इतक्या सडेतोड नि स्पष्ट पुराव्याने लढविले जात होते, की इंग्लीश लोकांना न्याय अन्यायाची तोळामासा शरम जरी असती, तरी बहुमताच्या जोरावर सभागृहात आलेले ठराव नि केलेल्या मागण्या फेटाळून लावल्याच गेल्या नसत्या,
सन १८४५ च्या अखेरीला अशीच पार्लमेण्टाची सभा भरली असता, पूर्वी सातारचा रसिदंट असलेल्या जनरल ब्रिग्जने, जोसेफ ह्यूम थॉमसन यांच्या बरोबरीने दणदणीत व्याख्यान देऊन गोवा कटाचा सगळा बनावट फापटपसारा सिद्ध केला. ब्रिग्जचे हे व्याख्यान मुंबईच्या ‘द इंडियन एक्झामिनर अॅण्ड युनिव्हर्सल रिव्यू’च्या जून १८४७ मध्ये संपूर्ण प्रसिद्ध झाले होते. ब्रिग्ज म्हणाला-- "रसिदंट नात्याने माझी विविध कामेच अशी होती की त्यामुळे प्रतापसिंहाचे वर्तन नि स्वभाव मला फार जवळून अभ्यासता आले. याच अवधीत आता सभागृहापुढे उभा असलेला महाराजांचा प्रतिनिधी, मिस्टर रंगो बापूजी, याचा नि माझा दाट परिचय झालेला आहे. गेली चोवीस वर्षे मी रंगोबाला ओळखत आहे. शिवाय तो गेली सात वर्षे आपल्या पदच्युत राजाच्या वाजवी हक्कांसाठी झगडत या देशात वसति करून राहिलेला आहे. सत्ताधीश (रॉयल) मालकाने सोपविलेली कामगिरी इतक्या प्रामाणीकपणाने उत्साहाने आणि नेकीने पार पाडणारा उमदा सेवक रंगो बापूजीशिवाय दुसरा माझ्या आढळात नाही. असे छातीठोक विधान करायला मला काहीहि दिक्कत वाटत नाही."
याच सभेत १६ जून १८४५ चा मुंबईच्या मराठी प्रभाकर पत्राचा अंक जनरल ब्रिग्जने पुरावा म्हणून, इंग्रजी भाषांतरासह सभेपुढे ठेवला होता. त्यांत बाळाजीपंत नातू हा नाठाळ कटबाज असून, त्याने आपल्या भोवती जमविलेले लोक कारस्थानी, घातकी, चोर असेच होते आणि त्यांत काही नातूचे नातेवाईकहि होते,असे लिहून, कर्नर्मल ओवान्सने या टोळक्यांच्या सहायाने राजाला हकनाहक छळण्याचे आणि अखेर त्याचा शोचनीय‘घात करण्याचे’ महापातक केलेले आहे, असा निर्वाळा दिलेला होता. गोवाकटातल्या बनावट शिक्क्यांची चित्रे प्रथमच या पत्रात छापलेली हिंदी लोकाना पहावयास मिळाली. ब्रिग्जने पुष्क झगडा केला. अखेर? अखेर बहुमताची फेटाळणी ठरलेली!
रंगोबाचे लढाऊ प्रचारतंत्र
फोर्ब्स, ह्यूम, थॉमसन, कोगन आदीकरून अनेक रथी महारथी आपल्या महाराजासाठी प्रयत्नांची कमाल शिकस्त करीत असताहि, पार्लमेण्टहि बहुमताच्या जोरावर साध्या माणुसकीच्याहि मागण्या भराभर धुडकाऊन लावताना पाहून, एकादा साधासुधा माणूस निराशेने केव्हाच कपाळाला हात लाऊन बसला असता. नव्हे, लंडन सोडून मुकाट्याने परत स्वदेशाला आला असता. पण रंगो बापूजी मात्र या विलायती गोर्याना डोंगळ्यासारखा जो एकदा चिकटला, तो पेकाट मोडले तरी लचका सोडी ना. हा वेळ पावेतो त्याने इंग्लीश राज्यपद्धति काय आहे, याचा पुरा अभ्यास केला होता. इंग्लंडातल्या एकूनेक कौंटीचा दौरा केला होता. ठिकठिकाणच्या मोठमोठ्या मुत्सद्यांचा स्नेह नि विश्वास संपादन केलेला होता. आता तर तो नुसते उत्तम इंग्रजी बोलत तर असेच, पण त्या भाषेत अस्खलित व्याख्यानेहि तो देऊ लागला होता.
शिवाय ‘डिप्लोमेटिक’ दरबारी इंग्रजी भाषा लिहिण्याची त्याची तयारी फोर्स ट्यूम प्रभृति मित्रहि वाखाणू लागले हाते. पार्लमेण्टची निवडणूक जवळ आलेली पाहून रंगोबाने गावोगाव जाऊन इंग्लीश जनतेपुढे पार्लमेण्टची बेगुमानशाही नि सातारा प्रकरण यांवर जाहीर व्याख्याने देण्याचा तडाखा चालू केला. आजकाल प्रोपागण्डा तंत्र एक शास्त्रीय विषय झाले आहे. रंगोबाने आपल्या काळी या तंत्राचा पुरेपूर उपयोग केला. सबंध इंग्लंड, स्कॉटलण्ड, आयर्लण्डभर त्याने शिळा प्रेसवर छापलेली मोठमोठी सचित्र पोस्टरे (चित्रांचे फरमे) गावोगाव नि खेडोपाडी चिकटविली. त्यापैकी हातातहि घरता येई ना असले एक जीर्ण पोस्टर मी स्वता पाहिले आहे. त्यात एका बाजूला मुंबईच्या कंपनी सरकारचा एक गोरा वकील ऑकझिण्डन साहेब रायगडावर शिवाजी छत्रपतीच्या राजभिषेकाच्या वेळी गेला आहे, दरबारात तो शिवाजीपुढे ढोपरे टेकून आदबीने उभा आहे आणि एक चमकदार हिर्याची आंगठी तो शिवाजीला आहेर म्हणून अर्पण करीत आहे, असे चित्र दाखविले होते आणि लगेच शेजारी दुसरे चित्र, त्यात, रसिदंट ओवान्स प्रतापसिंहाला उघडा बोडका पलंगावरून खेचून काढीत आहे, शेजारी आप्पासाहेब भोसले नि नातू उभे आहेत असे दाखविलेले.
पोस्टरवर धिसीज ब्रिटीश फेथ इन इंडिया (पहा ही हिंदुस्थानातली ब्रिटिशांची इमानदारी) असा ठळक अक्षरांचा मथळा होता. (या पोस्टरचा नमुना या ग्रंथात समाविष्ट केला आहे.) पोस्टरांच्या जोडीने सातारा प्रकरणातल्या एकेक हकिकती सारांशात गोष्टीवजा लिहिलेली हस्त पत्रके आणि त्याखाली "माणुसकीला काळीमा लावणारे असले अत्याचार, तुम्ही इंग्लीश जनता, किती दिवस डोळे उघडे ठेऊन पहाणार?" अशासारखे अनेक सवाल छापलेले असत. शिवाय, त्या वेळेपावेतो प्रोप्रायटर कोर्टात नि पार्लमेण्टात झालेल्या वादविवादांची अनेक पुस्तके, वर्तमानपत्रीत आलेल्या लेखांची पॅम्पलेटे वगैरे व्याख्यानांचे वेळी आपल्या हस्तकांकडून माफक किंमतीला विकण्याचीहि रंगोबाने जागोजाग व्यवस्था केली. मित्रांचा सल्ला घेऊन त्याने व्याख्यानांचा एक दौरा काढला. त्याची माहिती त्याने इंग्लंडात शिळाछापावर मोडी अक्षरानी स्वता एकटाकी लिहून छापलेल्या आपल्या सुविख्यात मोडी पुस्तकात दिलेली आहे, ती अशी –
“वाचणारे मंडळीस प्रार्थना. विनंती येथील कुशल तारा श्रावण वद्य ५ चंद्रवार शके १७६९ प्लवंगनाम संवत्सरे राज्याभिषेक शक १७३ मु. ता. ३० आगष्ट सन १८४७ पावेतो मु. शहर लंडण प्रांत इंगलीषस्थान येथे श्रीकृपेकरून यथास्थित असे विशेष. श्रीमन्महाराज राजश्री प्रतापसिंह महाराज छत्रपति संस्थान सातारा यांजवर खोटे फितुरी तुफाने मुंबई गवरमेंटानी तेरकटे सदीचे जोरानी उभी करून, जबरीने राज्यावरून काढून, खराब हवेत नेऊन ठेऊन सख्त इजा दिली, हा मजकूर जनजाहीर आहे. त्यास मुंबई गवरमेंटानी खोटे तरकटी फितूर राज्याचे जहागीरदार घेण्याबद्दल उभे केले. म्हणोन गवरनर जनरल यास लिहून पाठविले. परंतु इनसाफ मिळाला नाही. त्याजवरून छत्रपति सरकारचे आज्ञेप्रमाणे या मुकामी येऊन मी व माझे दोस्त प्रथम ऑनरेबल कोर्ट डैरेक्टर्स यासी बहुत वेळा इनसाफ करण्याविषयी बोललो. परंतु कार्टाचे उत्तर’’ मुंबई गवरमेंटानी खरे अगर खोटे केले, ते आम्हास कबूल आहे.
"दुसरे, बोर्ड कंट्रोल यासी बोललो. त्याने उत्तर कोर्टानी केले ते फिरावयाचे नाही म्हणतात. तिसरे, प्रिवि कौनसिल येथे काम चालवावे, तो वकील बारिष्टर म्हणतात, राजा पातशहा. इनसाफ या कौनसिलात पहाण्यास मॅजेस्टी कुईन म्हणजे राणीचा हुकूम पाहिजे. चवथे, मॅजेस्टी कुईन विकटोरिया यांस अर्जी दिली. परंतु उत्तर नाही. कुईनची हुकमत पहावी तो मोठे नांव धनी पारी हुकमत वजीर बारभाई यांच्या हाती.पाचवे, कुईन्स बेंच व कॅबिनेट कौनसिल येथे प्रयत्न करून, खोटे फितुराचे पुराव्याचे कागदपत्र दिले. परंतु उत्तर नाही. सहावे, मोठी कुदरत व अदल इनसाफ मागण्याचा दरबार मुख्य पार्लमेंट येथे मोकदमा बोलण्यासमयी चाळीस मेंबर हजर नाहीत. येणेप्रमाणे इंगलीप दरबार हा बाजार आहे. दाद न लागे. तेव्हा इंगलीश प्रांतीचे चालीवरून पाहता, सर्वत्र मुलखी लोक यांची कुदरत हुकमत पार्लमेंटचे मेंबरांवर मोठी सबब विचार करून पाहता. इंगलीष प्रांती सर्व जनास सदरहू मोकदम्याचा मजकूर जाहीर करावा, असे चित्तात ठरवून, दरबारी लोकास आधी खबर देऊन, काम चालविण्याबदल, मेहेबान ट्यूम एसक्वायर मेंबर नामदार पार्लमेण्ट यास पुकारा करतो. म्हणून पत्र पाठविले. ते त्याणी मुख्य वजीर लॉर्ड जॉन रसूल (रसल) यास दाखविले. परंतु दाद लागली नाही. सबब जागोजागी बोलणी (व्याख्याने) होऊन मजकूर जाहीर केला, त्यापैकी मोठमोठे महले ठिकाणीची नावे. हे ठिकाने कसबे व तालुके व तर्फा व प्रगणे वगैरे-
१ ता. २७ आगष्ट सन १८४६ - प्रथम जनरल कमिटी मारिलीबोन.
२ ता. १ सपटंबर सन १८४६ - लिटररी इंस्टीट्यूशन मैरिबन, कर्माषल रोड.
३ ता. १० सन १८४६ - कमांशल रोड
४ ता. १८ सपटंबर सन १८४६ - ब्रिटन
५ ता. ३० सपटंबर सन १८४६ - सिटी रोड
६ ता. ५ आक्टोबर सन १८४६ - इंस्टिट्यूशन ऑफ प्याकर्स
७ ता. १७ नवंबर सन १८४६ - लिटररी इंस्टिट्यूशन, ओल्डगेट स्ट्रीट मॅरिबन
८ ता. १८ नवंबर सन १८४६ - हमस्मित कौंटी मिडलसेक्स
९ ता. २४ नवंबर सन १८४६ - इंस्टिट्यूशन लेष्ट स्क्वेअर, वेस्ट मिस्टर
१० ता. २६ नवंबर सन १८४६ - हॉल आफ कामर्स सिटी
११ ता. २ डिसेंबर सन १८४६ - क्वीन कन्सर्ट रूम, हनोवर स्क्वेअर
१२ ता. १० डिसेंबर सन १८४६ - ब्रिटीश स्कूलरूम इगलटन.
१३ ता. १६ डिसेंबर सन १८४६ - लिटररी इंन्स्टीट्यूट, सिटी वेस्ट मिस्टर,
१४ ता. २१ डिसेंबर सन १८४६ - कमल हॉल चलसी.
१५ ता. १२ जानेवारी १८४७ - लिटररी इंस्टिट्यूशन, सौथिविक.
१६ ता. १४ जानेवारी १८४७ - हान्सकेजीटणसरी. (?)
१७ ता. १० फेब्रुवारी १८४७ - म्यूझिक हॉल फिशबरी.
१८ ता. ११ फेब्रुवारी १८४७ - न्याशनल.
१९ ता. २६ फेब्रुवारी १८४७ - प्यारंडन हॉल सिटी.
२० ता. २ मार्च १८४७ - ब्रांच लॅम्बथ.
२१ ता. २ मार्च १८४७ - ससेक्स डॉल लेडनहाल स्ट्रीट.
या शिवाय पुस्कल ठिकाणी बोलणी जाहली. परंतु तपशील लिहिता वाढे, सबब न लिहिले, येणेप्रमाणे वगैरे ठिकाणी जो मजकूर समजाविला, तो तरजुमा लिहिला आहे. तो मजकूर नजरेत येईल. काना मात्रा व्यंजन अक्षरे कमी जाजती असल्यास क्षमा करून लाऊन वाचा. दुसरे माझे मीच बोलण्याचा तरजुमा करून माझी अक्कल व गर्व होऊन दाखवितो म्हणाल त्यास माझा उपाय नाही. सरकारची आज्ञा आली तेव्हा करणे प्राप्त जाहले. मी सर्वांचा सेवक बहुत नम्र आहे. लोभ असावा हे विनंती.
सही
रंगो बापूजी चांद्रसेनीय गुप्ते प्रभु दुर्घट प्रवासी.
इंग्लंडातील लोकमत-जागृतीच्या रंगोबाच्या व्याख्यानांचा परिणाम फारच चांगला झाला. त्याचे नंबर ११ चे ता. २ दिसेम्बरचे क्वीन कनसॉर्ट रूमच्या भव्य दिवाणखान्यातले व्याख्यान अतिशय प्रचंड लोकसमुहापुढे झाले. रंगो बापूजीने सुमारे तीन तास इंग्रजी भाषेत अचाट वक्तृत्व करून श्रोत्याना काही ठिकाणी रडायला लावले. काही वेळा संतापाने शेमचा ओरडा करायला लावले, तर कित्येक वेळा लज्जेने खाली माना घालून सुस्कारे सोडायला भाग पाडले. सर चार्लस फोर्ब्स, ह्यूम, कोगन, थॉमसन मंडळी मधून, त्याला सूचना देत होती, पुराव्याचे कागदपत्र हातात देत होते, उत्तेजनहि देत होते. रंगोबाच्या या इंग्रजी व्याख्यानाचा ब्रिटिश स्त्रीपुरुष श्रोत्यांवर विलक्षण परिणाम होऊन, ४४ वजनदार मंडळीची एक कमिटी तेथेच स्थापन होऊन, या प्रकरणाचा निकाल तिने द्यावा, असा ठराव पसार झाला. तसेच, त्यानी ठरावून सांगितले की “रंगो बापूचे बोलण्याचे (व्याख्यानांचे व पुराव्यांचे) लहान बुक या देशीचे राज्यातील सर्व गावोगावी व प्रांतोप्रांती संपूर्ण ठिकाणी पाठवून सदरहू मजकूर सर्वत्र जनास जाहीर करावा." रंगो बापूजीच्या ठिकठिकाणच्या व्याख्यानांचे ‘अदुटे अक्षरांत’ (शॉर्टहॅण्डमध्ये) रिपोर्ट घेण्यासाठी ग्रीन नावाचा एक पार्लमेण्टरी रिपोर्टर नेमला होता. त्याला १२८ पौंड १८ शिलिंगाचे (रु. १२८०) एक बिल भरणा केल्याची पावती रंगोबाने ता. ७ सप्टेंबर १८४७ च्या आपल्या पत्रासोबत महाराजाकडे पाठविल्याचा उल्लेख आहे.
रंगो बापूजीचा पत्रव्यवहार
तब्बल १४ वर्षाच्या लंडनच्या मुकामाहून रंगोबाने महाराजाना आणि इतराना हजारो पत्रे पाठविली. तारीख तिथी वार महिना सन आणि लिहिण्याची वेळ वगैरे तपशील तर पत्रांत ठळक असायचाच, पण ज्या पत्राला उत्तर द्यायचे, त्यात कलमे किती नि त्या कलमांत मजकूर काय. तो सारांशाने देऊन नंतर कलमवार तो उत्तरे लिहीत असल्यामुळे, सर्व परिस्थितीचा तपशीलवार नकाशा त्याच्या पत्रव्यवहारात आपल्यापुढे स्वच्छ उभा रहातो. प्रत्येक पत्र तो आपल्या मोत्यासारख्या सुंदर वळणदार मोडी अक्षरानी कॉपिंग शाईने लिहून, त्याची पातळ टिशू कागदांच्या बांधीव पुस्तकांत लोखंडी प्रेसात दाबून अस्सल बरहुकूम नक्कल काढून ठेवीत असे. पत्रे ज्याची त्याला गेली नि पुढे नाहीशी झाली, तरी रंगोबाच्या नक्कल पुस्तकात त्याची अस्सल छापाची प्रत कायमच. माझे दिवंगत मित्र महाडचे सुप्रसिद्ध प्रोफेसर गोविंद गोपाळ टिपणीस यानी सन १८४७-४८ च्या रंगोबाच्या पत्रव्यवहाराचे अत्यंत जीर्ण झालेले नक्कल पुस्तक मला दिलेले आहे. यावरून अशी अनेक पुस्तके असली पाहिजेत आणि ती नष्ट झाली असली पाहिजेत. या एका पुस्तकावरूनच मला शेकडो मुकाबल्याचा नि परिस्थितीचा स्वच्छ अंदाज घेता आला. बाकीची अशीच मिळती तर केवढा मोठा इतिहास लाभला असता!
रंगोबाचे मोडी पुस्तक
सातारा प्रकरणाचे महत्वाचे इंग्रजी पुराव्यांचे कागद, सरकारी पत्रे, टीका, टिपा वगैरे खिळा टायपात छापून, सोबत स्वताच्या प्रेक्षणीय वळणदार मोडी अक्षरानी ५" x ८" आकाराची ३०० वर पाने लिहून शिळाछापावर छापलेले मोडी पुस्तक म्हणजे महाराष्ट्र सरस्वतीच्या मंदिरातले एक दर्शनीय स्मारकच म्हटले तरी चालेल. त्यातल्या कित्येक कागदांवरील शिक्के, दसखता, मखलाशा, त्या त्या लेखकाचे अस्सल हस्ताक्षर दाखविण्यासाठी, रंगोबाने मुद्दाम कारागिराकडून जशाच्या तशा शिळाछापाच्या पिवळया कागदांवर नकलून घेतलेल्या आहेत. याशिवाय या पुस्तकात त्याने औरसचौरस ६ फुटी तक्त्यांच्या पाठपोट लिहिलेल्या सलग दोन पुरवण्या जोडलेल्या आहेत. त्याहि स्वतः त्यानेच आपल्या हाताने मोडी लिपीत लिहिलेल्या आहेत. संबंध पुस्तक न वाचता, ही एकेक पुरवणी नुसती नजर टाकून पाहिल्याबरोबर एकेका कटाचा तपशील, कटबाजांची नावे, त्यांच्या जबान्या खऱ्याखोट्याची छाननी, वगैरे मजकूर वाचकाला चटकन आढळतो. इतक्या टापटिपीने राजकारणाची कामे एकहाती करणारी किती मंडळी चालू विसाव्या शतकाच्या मध्यावर आपल्यात आढळतील? मोठा प्रश्न आहे.
प्रकरण २६ वे
समुद्र-मंथनातले काळकूट
राजाच्या अर्जाची टोलवाटोलवी
जॉर्ज थॉमसन प्रतापसिंहाला काशीला भेटला, तेव्हा आपले आत्मनिवेदन एका विस्तृत अर्जाच्या रूपाने गवर्नर लॉर्ड हार्डिजकडे पाठवून न्यायाची याचना करावी, असे प्रतापसिंहाने म्हटल्यावरून जॉर्ज थॉमसन याने आपल्या भारदस्त इंग्रजी भाषेत एक अर्ज तयार करून दिला. ४२ पानांचे हे छापील पुस्तक इंग्रजी भाषेचा उत्कृष्ट नमुना आहे. या याचनेंतील मजकूर सुसंगत नि हृदयस्पर्शी असल्यामुळे त्यातला थोडासा भाग येथे देऊन मग त्या अर्जाची टोलवाटोलवी कशी नि का करण्यात आली, हे पाहू.
एवढ्या अफाट देशातील लोकांचे हिताहित पहाण्याची भरपूर सत्ता परमेश्वराने आपल्या हाती दिलेली पाहून, ही माझी कष्टमय नि असहाय स्थिति आपल्यापुढे मांडण्याची मला उमेद वाटते. मी जी विनंती करणार आहे ती म्हणजे अवघड किंवा बेसुमार आहे असा भाग नाही. माझी करुण कहाणी महशूरच आहे. परमेश्वरास स्मरून मी निःशंकपणे जाहीर करू इच्छितो की मजवर आणलेले आरोप सर्वथैव बनावट असून, त्यांपैकी एकहि गुन्हा मजकडून घडलेला नाही. मी पूर्ण निरपराधी असून नाहक ही शिक्षा मला भोगावी लागत आहे. तथापि त्या शिक्षेचेहि मला एवढेसे दुःख वाटत नाही. पण त्यामुळे माझ्या अन्रूला जो भयंकर काळिमा लागला आहे. तो आता मला अगदी सहन होत नाही. मरणापूर्वी माझी ही अब्रू जगापुढे निष्फलेक व्हावी, एवढी एकच इच्छा आता माझी राहिली आहे.
इंग्लंडात अगदी यत्कश्चित पामराससुद्धा न्यायासनासमोर उघड चौकशी झाल्याशिवाय शिक्षा होत नसते. एवढाही चौकशीचा हक्क मला मिळू नये, हे केवढे दुर्दैव? सरकारचे मनात मजबद्दल तेढ उत्पन्न होण्याचे आद्य कारण जहागीरदारांचा प्रश्न होय. या प्रश्नाची चर्चा कैक वर्षे होऊन अखेरीस ता. २४-१२-१८३४ रोजी डायरेक्टरानी निर्णय दिला की, `जहागीरदारांवर माझाच ताबा कायम समजावा.` असा निकाल डायरेक्टरानी केला तरी तो मला मात्र कधीच कळविण्यात आला नाही. हा वाद उत्पन्न झाला मूळ तहांतील शब्दांच्या अर्थावरून. तह बनविला एलफिन्स्टन साहेबांनी. ते अद्याप हयात आहेत. मी केलेला अर्थ बरोबर नसेल तर त्यासच खरा अर्थ काय तो विचारा, ते सांगतील तो निकाल बिनतक्रार ऐकायला मी तयार आहे. ही माझी मागणी मुंबई सरकारास अमान्य का व्हावी हे मला समजत नाही. माझी येथे चौकशी होई ना, तेव्हा इंग्लंडातील अधिकार्याकडे दाद मागण्याकरिता सयद मीर अफजल अली या गृहस्थास वकील म्हणून पाठविण्याचे मी ठरविले, ही गोष्ट मुंबईकरांचे मनास झोंबली. वकिलाचेमार्फत आपले अन्याय बाहेर येतील, त्याबद्दल वैषम्य वाटून सरकारांनी मजवर अनेक आरोप आणिले. त्यासंबंधाने गुप्त कमिशनामार्फत एकतर्फी तपास होऊन, माझा लेखी जबाब न घेता असा रिपोर्ट करण्यात आला की, ‘पुढे आलेला पुरावा मी खोडून काढू शकलो नाही’. यास न्याय म्हणावे की काय म्हणावे याचा आपणच विचार करा.
जहागीरदारांच्या प्रकरणाशिवाय आणखी आरोप मजवर ठेवण्यात आले आहेत ही गोष्ट मला प्रथम सन १८३९ च्या आगस्टात खुद्द कारन्याक साहेबानी कळविली. पोर्तुगीज सरकारशी कैक वर्षे मी गुप्त पत्रव्यवहार ठेवला, नागपूरकर आप्पासाहेबाशी मी अंतस्थ स्नेह जुळविला आणि पलटणाचे हिंदी अंमलदारांस फितवून इंग्रज सरकारविरुद्ध कट उभारला, असे आरोप मजवर सिद्ध असल्याचे ता. २३-८-१८३९ च्या भेटीत मला गवर्नर साहेबानी कळविले, आणि त्यातच असे सांगितले की. "गुन्हा कबूल असल्याचे लिहून द्या म्हणजे सर्व अपराध माफ करून सरकार पूर्ववत तुमचे राज्य तुमच्याकडे चालू ठेवील. गुन्हे नाकबूल कराल तर मात्र तुम्हास राज्यावरून काढावे लागेल." जे गुन्हे मजकडून घडले नाहीत, ते बळेच कबूल करून कायमचा खोटेपणा पदरात घेणे. मला मान्य झाले नाही. सत्यासाठी मी राज्यावर पाणी सोडले. सत्यापुढे राज्य किंवा ऐहिक ऐश्वर्य यांची किंमत काय? आरोप खोटे असल्याचे सरकारास माहीत असल्यामुळेच त्यांस माझ्या लेखी कबुलीची एवढी आवश्यकता वाटली. अशा रीतीने स्वताच्या कृष्ण कृत्यांवर झाकण घालण्याचा मुंबई सरकारचा खटाटोप होता, तो मी सफल होऊ दिला नाही. हाच सरकारच्या मते माझा मोठा अपराध होय.
जबरदस्तीने ते मला वाकवू लागले, पण मी त्यांस मान्य झालो नाही. त्यामुळे गवर्नर साहेबांचा डाव फसला. आपणच विचार करा की गवर्नर साहेबाशी मी जे हे वर्तन केले त्यावरून मी गुन्हेगार ठरतो की निर्दोषी ठरतो? गवर्नरसाहेबासमोर मी राज्यास लाथ मारून अलसंरक्षणाचा मार्ग पत्करिला, यात मी गुन्हा तो काय केला? माझ्या ठिकाणी आपण असता तर काय केले असते, याचा विचार मनात आणा, टक्कर, फोर्मा, शेफर्ड, कॉटन, साईक्स, रॉबर्टसन, सलिव्हन, शेक्सपियर, लॉडविक ब्रिग्ज अशा थोर गृहस्थानी माझ्या वर्तनाची तारीफ करून मजवर आणिलेले आरोप साफ खोटे आहेत. असे असंदिग्ध शब्दानी लिहून कळविले आहे. "अब्रूसाठी राज्य सोडणारा हा पुरुष खचित गुन्हेगार नव्हे आणि तो निरपराधी असतां अन्यायाने आम्ही त्यास शिक्षा करून राज्यावरून काढिले हा इंग्रजांचे नावास इतिहासात कायमचा डाग राहील. प्रतापसिंगाने मात्र बाणेदार वर्तनाने आपल्या कीर्तीत जास्तच भर घातली आहे." असे या मंडळीनी आपले मत प्रसिद्ध केले आहे. प्रत्यक्ष गवर्नर ग्रांट नि कारन्याक यांचा देखिल अभिप्राय, माझे म्हणणे ऐकून घेतल्या शिवाय शिक्षा करू नये असाच होता.
"बरे, झाल्या गोष्टी त्या काही नव्हेशा होत नाहीत. मला जो अन्याय झाला त्याची भरपायी करून देणे आता सरकारच्या हातात नाही. तथापि माझ्या नावास लागलेला कलंक अद्यापि धुऊन निघत नाही याचेच मला अत्यंत दुःख होत आहे. माझ्या नशिबी यातना भोगावयाच्या होत्या त्या मी भोगल्या. सरकाराने व त्यांच्या उच्छृंखल अधिकाऱ्यानी माझा नाहक छळ केला, ही गोष्ट जगजाहीर आहे. अद्यापि माझ्या गुन्ह्याची उघड चौकशी करून अब्रू साफ करण्याची संधि आपण मला द्यावी. एवढेच माझे आपणापाशी शेवटचे मागणे आहे. परमेश्वराने आपल्या हाती जो थोर अधिकार दिला आहे. त्याचा योग्य उपयोग करून, मला अन्यायाने शिक्षा झाली, हे सिद्ध करण्याची संधि एकवार द्याल तर मी आपला सदैव आभारी होइन." (ता. २ डिसेम्बर १८४४).
परक्या देशात वाईट हवेत, अनंत अपेष्ठा, मानसिक वेदना सहन करीत, भविष्याविषयी बहुतेक निराश झालेल्या प्रतापसिंहाचे हे पत्र म्हणजे त्याच्या निष्कलंक मनोवृत्तीचा, सत्यासाठी नि स्वाभिमानासाठी प्रत्यक्ष मृत्यूलाहि कवटाळण्याच्या त्याच्या निर्धाराचा स्वच्छ फोटोग्राफच होय. हा अर्ज गवर्नर जनरलचा एजंट मेजर कारपेण्टर याने मोठ्या उमेदीने कलकत्याला लॉर्ड हार्डिजकडे रवाना केला. यशवंतराव चिटणिसाने त्याची एक एक प्रत लंडनला रंगो बापूजीकडेहि माहितीसाठी पाठऊन दिली. वास्तविक या अर्जावर गवर्नर जनरलने आपला शेरा मारून अखेर निर्णयासाठी डायरेक्टर-प्रोप्रायटर कोर्टाकडे तो रवाना करावयाचा होता. पण महाराजाना त्या अर्जाची नुसती पोच चिठी सुद्धा आली नाही. लंडन कचेर्यात तपास करता त्यानी कानावर हात ठेवले.
१० जून १८४५ ला जोसेफ ह्यूमने कॉमन्स समेत चौकशीचा प्रश्न मांडला. `हिंदुस्थानात लिहून तो अर्ज नि त्याच्या पुरवण्या मागवाव्या आणि ते सर्व कागद छापून सभासदाना मिळावे’, असा ठराव करून घेतला. रंगोबाने हे ता. २३ आक्टोबरला राजाला कळविले. १८४५ च्या डिसेम्बरात रंगोबाचे पत्र हाती पडताच राजाने मेजर कारपेण्टरची भेट घेतली. त्याने फिरून तो अर्ज पाठविण्याची `अर्जण्ट` व्यवस्था केली. त्याला जबाब आला. की गवर्नर जनरल बहादूर सध्या पंजाबातल्या शिखांच्या धामधुमीसाठी तिकडे गेले आहेत. अशा वेळी त्याना त्रास देणे योग्य नाही आणि त्याना काही याबाबत लिहिलेच तर उत्तरहि मिळणे मुश्किलीचे आहे.
त्यावर कारपेण्टरने माहिती दिली की तो अर्ज यापूर्वीच लंडनला रवाना झाला असला पाहिजे. पुन्हा १३ मार्च १८४६ ला ह्यूमसाहेबाने कॉमन्समध्ये चौकशी केली. थातरमातर उत्तर मिळाले. त्यावर रंगो बापूजीने कॉमन्सला लिहिले की, "तुमच्या मताने राजाचा दोष सिद्ध आहे, तर राजाचे पत्र उजेडात आणायला तुमची कां छाती होत नाही? खरा प्रकार येथल्या सज्जन इंग्रज नागरिकाना आता पुरता कळून चुकला असल्यामुळे तुमच्या राज्यकारभाराची पिंगे चव्हाट्यावर येऊन, स्वदेशात तुमची नाचक्की होऊ नये, एवढ्यासाठी त्या माझ्या राजाच्या महत्त्वाच्या सत्यनिरूपणाची अशी टोलवाटोलवी तुम्ही चालविलेली आहे. कोणत्याहि सरकारच्या सामान्य नीतीला लज्जा आणणारी कृत्यें त्या अर्जात प्रकट केलेली असल्यामुळे, तो इकडे आलाच नाही, अशी थापबाजी तुम्ही चालविली आहे. आम्ही त्या अर्जाची प्रत दाखल केली तर म्हणे ती योग्य मार्गाने म्हणजे गवर्नर जनरलच्या मार्फतच आली पाहिजे, आणि ते बड़ेलाट तर बसले आहेत तो अर्ज दडपून! इंग्रजी न्याय म्हणतात तो हाच काय?’’
`मला समजता तरी कोण तुम्ही?`
प्रतापसिंहावर आणलेले आरोप सिद्ध करण्यासारखे नाहीत नि त्याने धरलेला उघड चौकशीचा आग्रह मुळीच गैरवाजवी नाही, ही लॉर्ड हार्डिजची बालंबाल खात्री असल्यामुळेच, राजाच्या पत्राला उत्तर देण्याची, अथवा ते डायरेक्टर कोर्टाकडे पाठविण्याची त्याला हिंमत झाली नाही. म्हणून त्याने एक निराळाच रस्ता काढला. १८४५ च्या सपटंबरात हार्डिज काशीला गेला. राजाने त्याची समक्ष भेट घेण्याची मेजर कारपेण्टरच्या मार्फत खटपट केली. समोरासमोर मुलाखत झाली तर मी माझ्या निरपराधपणाची लाटसाहेबाना खात्री पटवून देईन, असे राजाने कारपेण्टरला सांगितले. पण बडे लाट भेट देतीलच, असा त्याला भरंसा वाटेना, तथापि मेजर कारपेण्टरने संधि साधून, राजविषयी आपला सहा वर्षांचा अनुभव, त्याच्या निर्दोषीपणाविषयी झालेली आपली खात्री, त्याचे होत असलेले हाल आणि कर्जाचा बोजा, इत्यादि गोष्टी लॉर्ड हार्डिजच्या कानावर घातल्याच.
राजा बेगुन्हा आहे हे हर्डिंजची मनोदेवता स्पष्ट सांगत होती. तसेच, राजाच्या वकिलाने इंग्लंडभर चालवलेल्या चळवळीने हिंदवी-ब्रिटीश कारभारातले डोंगधतुरे, विश्वासघात, कपटी डावपेच खोट्या साक्षी नि खोटे दस्तऐवज असल्या घाणेरड्या भानगडी चव्हाट्यावर आल्या, हेहि त्याला स्पष्ट दिसत होते. इंग्रजांची खुद त्यांच्याच मायदेशात होणारी ही बदनामी बंद पाडण्यासाठी हार्डिजने एक युगत लढवली. मेजर कारपेण्टरने खाली दिलेल्या तीन अटी राजाला सुचवाव्या, असे हार्डिजने त्याला सांगितले.-
(१) गेली ६ वर्षे न्याय मिळविण्यासाठी राजाने खूप तंगडझाड केली, पण ती व्यर्थ गेली. ज्याअर्थी माझी दाद कोठेच लागत नाही, त्याअर्थी मी आत्मसंतोषाने सातारा राज्यावरचा संपूर्ण हक्क सोडून देतो, असे त्याने लिहून द्यावे.
(२) लंडनमध्ये त्याच्या एजंटाने चालविलेली चळवळ बंद पाडण्यासाठी, त्याला ताबडतोब परत बोलावून घ्यावे. आणि असे केले तर
(३) राजाला योग्य वाटेल त्या हवेच्या ठिकाणी रहाण्याचा, त्याची मासिक नेमणूक वाढविण्याचा आणि त्याने घेतलेल्या दत्तकाला मान्यता देण्याचा सरकार सहानुभूतीने विचार करील.
या अटी मेजर कारपेण्टरने प्रतापसिंहाला कळविताच तो सात्त्विक संतापाने गोरामोरा झाला. त्याने लॉर्ड हार्डिजला जबाब पाठविला की- "तुम्ही मला एखादा दुकानदार महाजन, सावकार, बंगाली बाबू किंवा जमीनदार शेतकरी समजता? समजता तरी कोण मला तुम्ही? मराठी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या गादीवरचा मी त्यांचा खास वंशज आहे. त्या स्वराज्यावरील हक्क मी सोडून देऊ म्हणता? असे करून माझ्या पूर्वजांच्या नावाला मी तर काळीमा लावणार नाहीच नाही पण माझा एकहि वंशज तसे करणार नाही. हाच आमचा स्वधर्म आहे. तुमच्या अटी मान्य करण्यापेक्षा मी मरण पत्करीन."
ही मुलाखतीची आणि खटक्याची भानगड बरेच दिवस पडद्याआडच होती. पण एकाकी जॉर्ज थॉमसनने ती इंडियन एक्झामिनर अॅण्ड युनिवर्सल रिव्यूच्या एप्रिल १८४७ च्या अंकात समग्र छापून जगाच्या नजरेला आणली. इतकेच नव्हे तर १८ मार्च १८४६ च्या डायरेक्टर कोर्टाच्या सभेपुढे ते सर्व कागद मांडून, लॉर्ड हार्डिजने केलेल्या या उठाठेवीला डायरेक्टर कोर्टाचा आधी पाठिंबा मिळवलेला असलाच पाहिजे, असा स्पष्ट आरोप केला.
सभा आटोपताच सगळ्या डायरेक्टरांत मोजी कुजबुज चालू झाली. थॉमसनने पुढे मांडलेले कागदपत्र जर खरे ठरले, तर या सातारा प्रकरणाकडे पहाण्याचा आपला दृष्टीकोण आपल्याला साफ बदलावा लागेल आणि राजाच्या बाजूने आपल्या मतदानाचे हात उभारावे लागतील. ता. २४ मार्च १८४६ ला कोर्टाने हे थॉमसनचे कागद लॉर्ड हार्डिजकडे त्वरित खुलाशासाठी रवाना केले. त्याने मेजर कारपेण्टरकडे काशीला पाठवून दिले. त्याने २५ मे १८४६ ला उलट जबाब दिला. ‘‘२४ मार्चला जॉर्ज थॉमसनने कोर्टापुढे, बडेलाट आणि मी यांच्या मुलाखतीच्या तपशीलाचा पुरावा देणारे जे भाषण केले ते बव्हंशी खरे आहे. किरकोळ तपशीलाच्या चुका आहेत. पण त्या महत्वाच्या नाहीत.’’ इतके लिहून, मेजर कारपेण्टरने राजाच्या निर्दोषीपणाबद्दल स्वताचे स्पष्ट मत एका लांबलचक शेन्याने लॉर्ड हार्डिजला कळवले.
कारपेण्टर म्हणतो- "सन १८४० पासून मी या राजाचे जीवन अभ्यासीत आहे. त्याचा सर्व पत्रव्यवहार आणि राज्याच्या भानगडीचे हजारो कागद मी न्यायनिष्ठुरतेने अभ्यासिले आहेत. त्यावरून राजावर एकहि आरोप सिद्ध करण्याइतका काडीचाहि पुरावा नाही, अशी माझी बालंबाल खात्री झालेली आहे. २-१२-१८४४ च्या त्याच्या पत्रात उघड चौकशीची केलेली मागणी पुरी करण्यात आली, तर तो निस्संशय निरपराधी म्हणूनच ठरला पाहिजे, अशी त्याच्याप्रमाणे माझीहि खात्री आहे."
कारपेण्टरच्या या शेऱ्याने लॉर्ड हार्डिजच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. कंपनी सरकारचा एक बडा अधिकारी, गवर्नर जनरलचा एजंट खास आपल्या सरकारविरुद्ध एका हिंदू राजाची तरफदारी करतो, म्हणजे काय बात आहे? लगेच बडेलाटाच्या सेक्रेटरीचे कारपेण्टरला लिहून आले की, "सरकारने गुन्हेगार ठरविलेल्या राजाच्या निरपराधपणाचा पुरस्कार करण्याचे आपले कर्म गैरशिस्त नि गैरवाजवी आहे."
वरिष्ठाने दिलेला असला दोष मुकाट्याने गिळण्याइतका मेजर कारपेण्टर कच्चा मातीचा पुतळा नव्हता. माझ्या २६ वर्षांच्या नोकरीपैकी १२ वर्षे मी पोलिटिकल खात्यात अनेक "जबाबदारीच्या जागांवर इमानाने घालवलेली आहेत. गैरशिस्तीचा नि गैरवाजवीपणाचा आपण आज पहिल्यांदाच माझ्यावर आरोप करीत आहात. राजावर आणलेल्या आरोपांत ज्या ज्या खोट्या कटांची जाळी विणण्यात आलेली आहेत, त्यांचा फोलपणा नि दुष्टावा मला पूर्ण पटल्यावर, केवळ वरिष्ठाना खूष करण्यासाठी, मी खोट्याला खरे म्हणावे, असाच आपला आग्रह असल्यास, माझा नाईलाज आहे. तसे माझ्याकडून होणे नाही, याचे मला फार वाईट वाटते," असा खडखडीत उलट जबाब त्याने ता. २ जुलै १८४६ रोजी कलकत्त्याला पाठवून दिला. थोड्याच दिवसांत कारपेण्टरची बदली होऊन, त्याच्या जागी मेजर जी. एच. मॅक ग्रेगर या अर्कट टॉमीची नेमणूक करण्यात आली. आंग्रेजी कारभारात न्यायाचा डंका मोठा. पण खरे नि ते स्पष्ट बोलणाराला मात्र तेथे कोठेच जागा नसायची, है हिंदी लोकाना आता विस्ताराने सांगण्यात काही अर्थच राहिलेला नाही.
लॉर्ड हार्डिज नि मेजर कारपेंटर यांच्यातील या खटल्याचे कागद डायरेक्टर कार्टापुढे येऊन त्यावर वादविवाद झाल्याची बातमी ता. १७ सप्टेंबर १८४७ च्या पत्राने रंगो बापूजीने काशीला कळविली.
जंगली महाराजाचे दत्तविधान
काशीच्या हवेने प्रकृति दिवसेदिवस खालावत चाललेली न्यायाच्या मागणीला हिंदुस्थानात अखंड झिडकारणी चालू आता केवळ इंग्लंडातल्या उदार जनतेने पार्लमेण्टवर जोर आणून काही मार्ग निघेल एवढीच आशा, असा सर्व बाजूनी विचार करून, प्रतापसिंहाने, पूर्वी केलेल्या संकल्पानुसार, कै. बळवंतराव भोसले सेनापति याचा मुलगा त्रिंबकजी उर्फ जंगली महाराज याला १८४५ च्या आक्टोबरात मेजर कारपेण्टरच्या समक्ष विधिपूर्वक दत्तक घेतला. ता. १० आकटोबर १८४५ च्या राजाच्या मृत्युपत्रात लिहिले आहे कीं, ‘‘माझ्या दोनीहि राण्याना पुत्र झाला नाही. सबब आमच्या हिंदू धर्माप्रमाणे मी माझे आप्त कै. बळवंतराव राजे सिसोदे भोसले यांचा पुत्र त्रिंबकजी राजे सिसोदे भोसले यास विधिपूर्वक दत्तक घेऊन त्याचे नाव शाहाजी असे ठेविले आहे. सदरहू त्रिंबकजी याची मातोश्री गुणवंताबाई हिची या दत्तविधानाला संमति असून तिला दुसरा मुलगा दत्तक घेण्याची आम्ही परवानगी दिलेली आहे. माझ्यामागे माझ्या राज्याचा खासगी नि सरकारी खजिना नि मालमत्तेचा, माझ्या पदव्यांचा आणि मी उपभोगिलेल्या सर्व अधिकारांचा नि सत्तेचा त्रिंबकजी हा कायदेशीर वारस समजण्यात यावा. विलायतेच्या मोकदम्याचा निकाल माझे हयातीत लागला तर ठीकच, न लागल्यास तो आमचे दत्तपुत्र शाहाजीराजे यांचे नावाने पुढे चालवावा आणि ब्रिटीश सरकाराने त्याना न्याय द्यावा.’’
मेजर कारपेण्टरने ता. १२ डिसेंबर १८४५ च्या पत्राने दत्तविधानाचे वृत्त आणि राजाचे मृत्युपत्र कलकत्त्याला गवर्नर जनरलकडे पाठवून दिले. त्याने ते पुढे लंडनला डायरेक्टर कोर्टाकडे ता. ६ जानेवारी १८४६ ला रवाना केले. या दत्तविधानाला हिंदुस्थानात किंवा विलायतेला कोणीहि अधिकार्याने काही आक्षेप घेतला नाही. (मराठी रियासत उ. दि. ३ मध्ये या दत्तविधानाची दिलेली तारीख २५ जानेवारी १८४७ चूक आहे.)
थॉमसनचा अखेरचा टोला
बुधवार ता. २३ सप्टेंबर १८४६ रोजी प्रोप्रायटर कोर्टाची त्रैमासिक सभा भरली. त्यावेळी थॉमसनने डायरेक्टर कोर्टाच्या निषेधाचा ठराव मांडून अतिशय ज्वलज्जहाल भाषण केले. स्याला सर चार्लस फोर्ब्स, ल्युईस, कॅपटन कोगन, पॉइण्डर आणि इतर अनेक सभासदानी जोरदार पाठिंबा दिला. इतकेच नव्हे तर गवर्नर कारन्याक (या चाण्डाळ कारन्याकच्या नावाने मुंबईतल्या कारन्याक बंदर. कारन्याक पूल नि रस्ता या जुलमी नि पापी स्मारकांवर मऱ्हाठ्यानी नि मराठ्यानी आता कायमचा बोळा फिरवला पाहिजे.) आणि रसिदंट ओवान्स यांच्यावर बेकायदा वर्तन केल्याचे खटले भरून न्यायासनासमोर त्याना खेचावे, अशीहि मागणी केली. या भाषणात थॉमसनने वक्तृत्वाची जेवढी कमाल केली, तेवढीच चमकदार तडफ सातारा प्रकरणातील अनेक अन्यायांचा मुद्देसूद फडशा पाडण्यात दाखवली. हे समग्र मोठे व्याख्यान ब्रिटीश फ्रेण्ड ऑफ इंडिया मासिकाच्या आकटोबर १८४६ च्या अंकात छापले गेले आणि त्यातले कित्येक उतारे लंडनच्या अनेक वृत्तपत्रानीहि छापले.
चौकशी कमिटी नाही, तर तिजोरी बंद
२५ जून १८४७ रोजी कॉमन्सच्या सभेत जोसेफ ह्यूम यानी दणकाऊन सांगितले की प्रतापसिंहाच्या आक्रोशाचा निवाडा करण्यासाठी, सभेने जर ताबडतोब कमिटी नेमली नाही, तर आम्ही पार्लमेंटच्या खर्चाचे बजेट मंजूर करणार नाही. या धमकीने जिकडे तिकडे धावाधाव सुरू झाली. बजेट मंजूर झाले नाही, तर राज्यकारभाराचा गाडा खर्चाशिवाय जागच्या जागीं थंड पडणार तेव्हा मि. हॉग डायरेक्टर आणि लॉर्ड जॉन रसेल इत्यादि अनेक मंडळी रूमच्या बिर्हाडी समजुतीसाठी खेटे घालू लागली. ‘आम्ही राजाविषयी बंदोबस्त करीतच आहोत. पण आत्ताचही बजेट मंजुरीची खीळ घालू नका`, अशा विनवण्या ते करू लागले. त्यावर ह्यूमने उत्तर दिले की ही समोपचाराची भाषा यापूर्वी कां निघाली नाही? नाक दाबणी जोराची आहे म्हणूनच ना तुम्ही ही बंदोबस्ताची भाषा बोलू लागलात? १२ जुलईला पुन्हा सभा भरली, तेव्हा रसेलच्या अडवणुकीची पर्वा न करता, ह्यूमने गोवा प्रकरणावर जहाल भाष्य केले. याचा परिणाम "ब्रिटीश गवरमेंटची आबरू या कामात फार कमी जाहाली, हाली आपसात काही तजवीज करावी बोलतात. परंतु प्रतियास ईश्वर आणील तेव्हा खरे." या शब्दानी रंगोबाने ता. ६ जुलैच्या पत्राने महाराजाना कळविला. पत्रांच्या बरोबरच लंडनच्या असल्या सभांचे वृत्त देणान्या पत्रांचे अंक रंगोबा नेहमीच बिनचूक महाराजाकडे पाठवीत असे.
नॉटिंगहॅमने हॉबहाऊसला झिडकारले
सर जॉन हॉबहाऊस म्हणजे जाडी प्रकरण. कंट्रोल बोर्डाचे चेअरमन, करतील ते कारण नि बांधतील ते तोरण, असा सत्तेचा दिमाख पण रंगोबाच्या नि त्याच्या इंग्रेज मित्रांच्या प्रचारकार्याचा जो धुमाकूळ चालला होता, त्यामुळे ज्या नॉटिंगहॅम परगण्यातून ते नेहमी हमखास निवडून यायचे, तेथे सरसाहेब पार्लमेण्टच्या नव्या निवडणुकीसाठी मतयाचना करायला गेले असता, तेथल्या नागरिकानी भरसभेत त्यांच्या जुलमी कारभाराची भंबेरी उडवली. सातारा प्रकरणाविषयी शेकडो प्रश्न विचारून, लोकानी त्याना चक्क पिटाळून लावले.
`कसं काय रंगोबा, मेहरबानी आहे ना?`
"ता. २३ जुलई रोजी कुईन विकटोरिया इंगलीष सरकारची स्वारी हौस आफ लार्ड या दरबारात पारलमेंटाची बदली करून नवे पारलमेंट करण्याचा हुकुम देण्याबाबत मोठा दरबार होऊन समारंभ जाहला. त्या दरबारास मी गेलो होतो. दरबार बरखास्त जालियावर थोडक्या वेलात सर ज्यान आबा हाँस बोर्ड कत्रोल आपण होऊन येऊन भेटले आणि बोलले, हे हौस लार्डचे तयार जाहाले, हे कसे आहे?’’ नंतर सेवकानी (रंगोबाने) उत्तर केले. "या कचेरीचे नये काम फार चांगले जाहाले आहे. ही आवल इनसाफाची जागा आहे. परंतु तुम्ही बोर्ड कंत्रोल. तुमचे हाती हिंदुस्थानचे काम आहे. परंतु तुमचे दरबारात आंधार आहे. तेथे आले असता तुम्ही भेटत सुधा नाही. इनसाफाचा रस्ता बंद करता. परंतु हे तुम्हास नीट नाही. इनसाफाचा हुकूम देण्यास तुम्हास कोणती मुस्कल आहे?" नंतर उत्तर करतात की "मी काय करू हा रस्ता सुचत नाही." (३१७-१८४७ चे रंगोबाचे काशीला पत्र) सर जॉन निघून गेल्यावर अनेक मेम्बर रंगोबाजवळ येऊन बोलले, "काय रंगोबा, ओळखता का तुम्ही या महाशयाना? हे हॉबहौस. यानीच तुमच्या राजाचा छळवाद चालविलेला आहे बरं." त्यावर "अहो, ते असतील मोठे मुख्याधिकारी, पण कारभार चालतो तुम्हा सगळ्या मेम्बरांच्या मतमोजणीवर, नेमके त्याच वेळी बहुमत होऊन आमच्या खटपटीवर पाणी पडत आलेले आहे. तेव्हा तुम्ही थोर मेम्बर मित्रानी आमच्याकडे पाहिले तर काय आम्हाला न्याय मिळणार नाही?" असे रंगोबाने म्हटल्यावर हे मुलाखत आख्यान पुरे झाले. नॉटिंगहॅमच्या नागरिकानी आपल्याला धुडकावून लावण्यात याच लाल पागोटीवाल्या चळवळ्याचे प्रचारयंत्र कारण, हे जाणूनच हॉबहौस रंगोबाशी बोलायला आला. नाही तर स्वारी पक्की आखडू नि गुर्मीबाज!
काशीचे टपाल नि मित्रांची उठावणी
काशीचे सपटेंबरचे टपाल हाती येताच त्यात तेथल्या वाईट हवेमुळे १० जुलै १८४५ रोजी प्रतापसिंहाची राणी लक्ष्मीबाई वारली आणि खुद्द राजाचीहि प्रकृति ढासळत चालली. असे वर्तमान आले. रंगोबाने लगेच मित्रांचा सल्ला घेतला. आपल्याला अनुकूल अशा पार्लमेंट मेंबरांच्या आणि लंडन शहरातल्या काही वजनदार नागरीक पुढार्याच्या सह्या घेऊन, `प्रतापसिंहाची प्रकृति ढासळत आहे, त्याच्या जिवाला काही दगा फटका झाला तर त्याबद्दल आम्ही पार्लमेण्टाला जबाबदार धरू’, अशा आशयाचा एक मोठा अर्ज तयार करून तो कंपनीची तीनहि कोर्ट आणि लॉर्डस नि कॉमन्सकडे रवाना करण्याचे काम हाती घेण्यात आले.
लक्षावधि नागरिकांच्या सह्या
या अर्जाचा मसुदा वृत्तपत्रांत येताच सगळीकडे एकच निषेधाची आरोळी उठली. प्रतापसिंहाच्या एकंदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नव्या पार्लमेण्टाने ताबडतोब एक निर्णय-कमिटी मंजूर करावी, अशा आशयाच्या अर्जावर ग्रेट ब्रिटन मधील कौण्टी नि खेडीपाडी येथल्या नागरिकांच्या सह्या मिळवण्याची फार मोठ्या खर्चाची नि श्रमाची योजना निघाली. रंगोबाने या कामी सर्वस्वच पणाला लावले. गावोगाव अनेक इंग्रज मित्राना भेटून त्याना हे सह्यांचे काम दिले. जेथे जाईल तेथे तो लोकांपुढे व्याख्याने देई आणि खासगी किंवा जाहीर मुलाखती देऊन, आपला हेतू लोकांच्या गळी उतरवी. पूर्वीच्या प्रचाराने तेथले लोकमत चांगलेच तयार झालेले असल्यामुळे सह्या मिळवण्याच्या कामी त्याला गावोगाव अनेक इंग्रज स्त्री पुरुषानी मदत करायला कंबर बांधली. या सही प्रकरणामुळे ठिकठिकाणच्या उमेदवारांची निवडणुकीची व्याख्याने नेहमीसारखी सरळ पार पडेनाशी झाली. सातारच्या राजावरील अन्याय दूर करशील तर मत माग, नाहीतर चले जाव यहांसे, असा प्रकार चालू झाला.
रंगोबाच्या खिशाची अवस्था
प्रतापसिंहाची रवानगी काशीला झाल्यापासून रंगोबाला अधूनमधून काही रकमांच्या हुंडया थॉमसन किंवा कोगन यांच्या नावानी आलेल्या मिळत असत. पण एकंदर परिस्थितीचा निर्वाळाच द्यायचा म्हटले, तर पैशासाठी त्याने तोंड वेंगाडले नाही, असे एकहि पत्र मिळायचे नाही. लंडनच्या विलायती प्रचारयंत्राचे स्वरूप काय आहे. नुसत्या छपाईसाठी कसा पैसा ओताया लागतो, शिवाय वकील बॅरिष्टरांची कायदेशीर जरूर पडल्यास त्यांच्या फियांसाठी, सभांचे नि भाषणांचे रिपोर्ट घेण्यासाठी वृत्तपत्रांचा पाठिंबा कायम टिकवण्यासाठी हजारो पौंड उधळले जातात. तेव्हा कधि १० हजार, तर कधि पाचच हजार, केव्हा दैवयोगाने १५ हजार अशा केवळ रुपयांच्या हुंड्यानी विलायती राजकारणाची भूक शमणारी नव्हे, हे अनेक वेळा त्याने महाराजाना खुलाशेवार लिहिलेले आहे. ३० जुलै १८४७ च्या पत्रात महाराजानी "दागिन्याचा लिलाव करून हाप्तबंदीने दैवज तेरा हजार पाठविला.” त्याची रंगोबाने पोच व हिशोब दिलेला आहे. तुमचा खर्च फार होतो. असे दोन तीन वेळा त्याला चिटणीसाचे लिहून आले होते.
“राजकारणाचे काम. यात मुदत आगर नेम नाही. त्यात फक्त जीद लागते. या मुकामी खर्चास नाही तर येथे रहाण्याचा उपयोग कोणता? सरकारी चाकरी नाही व मोक्षसाधन म्हणावे तेहि नाही, व स्वदेशहि नाही. आता गाडीभाडे वगैरे खर्च न होऊ देता घरी बसणे तर कोण दोस्त माझे बिऱ्हाडी येतो? कोण तजवीज पहातो? हे येकाचे काम नव्हे. खर्च पाहता तरी सरकारी त्यात माझा खर्च तरी येक माणूस घेऊन राहिलो, तरी खर्च फार जाहाला हे तेथे सर्वांचे नजरेत आले हे नीटच आहे. असो. विस्तारे विनंती लिहिण्यास लाप्यार. यापुढे या मुकामी राहून सेवा करावी, अशी उमेदहि राहिली नाही." असा जबाब रंगोबाने दिला. काशीहून वेळेवर ऐवज यायचा नाही, हे ठरून गेल्यासारखेच होते. प्रत्येक डाकेत पत्राशिवाय जमाखर्चाचा ताळमेळ, पावत्या, पुढचा अंदाजी खर्च, वगैरे सर्व हकिकत काशीला पाठवायला तो विसरत नसे. “हे राजकारणाचे काम घोडे येकाचे हाती, लगाम दुसऱ्याचे हाती नि बसणार तिसरा वेळेवर ऐवज नाही, तर काम कसे चालणार?” सर चार्लस फोर्चा, जॉर्ज थॉमसन, कोगन, रॉबर्टसन वगैरे मंडळी रंगोबाला अधूनमधून प्रचारकार्यासाठी रकमा देत असत.
स्वतः त्याची रहाणी टापटिपीची होती तरी खर्चाची नसे. एका नोकरावर सारे काम तो भागवीत असे. तोच जेवण करायचा नि तोच त्याचा धोबी. लंडनला १४ वर्षे राहिला पण त्याला विडी चिरुटाचे किंवा अर्क मद्यपानाचे व्यसन लागले नाही. सांजसकाळ त्याची संध्या चुकली नाही. जानवीजोड नि पंचांग मागविल्याचे नि ते पावल्याचे अनेक संदर्भ त्याच्या पत्रांत दिसतात. याशिवाय, तूर मूग उडीद किंवा त्यांची डाळ पोहे वगैरे जिन्नस तो नेहमी मागवीत असे. ही त्याची साधी रहाणी आणि निर्व्यसनीपणा पाहूनच फोर्ब्स प्रभृति दोस्त रंगोबावर बंधुवत् प्रेम करून त्याला कसलीही अडचण भासू देत नसत. ता. २१ आक्टोबर १८४७ च्या पत्रात तर तो स्पष्टच लिहितो की "आज्यांच्या कागद खरिदी व मोकदमा छ्यापणे वगैरे खर्च कर्ज घेऊन चालविला आहे. त्यास जर या समई काही तजवीज न करता निचित राहावे तरी पुढे शेकडो रुपये खर्च करून निरफल होणार, सबब खर्चाची तजवीज नवीन होऊन आज्ञा आली पाहिजे." सर चार्लस फोर्ब्स यास रंगोबा आणि प्रतापसिंह `वृद्ध` नावानेच पत्रात लिहीत असत. "या शहरात हाली दिवाली निघून लाखो रुपये बुडाले. वृद्धाचा व्यापार कायम आहे." अशी बातमी याच पत्रात लिहिलेली आहे.
विलायतची पार्लमेण्ट- निवडणूक
"सिटी वैसमिष्ट व म्यारिलीबोन या दोनी ठिकाणी मेंबर होण्याचे बोलण्या समई गेलो. या बोलण्यास सुमारे दहा बारा हाजार मनुषे जमली होती. त्यासी ज्याणी मेंबर होणे त्याणी बोलावे. त्या समई पुकारा आणि गलबला बाजाराप्रमाणे करतात. ज्याचे मनास येईल ते सवाल मेंबर होणारास करितात. रागास येतात. सिव्या देतात. तू खराब काम केले, तुला वोट देत नाही म्हणतात. आसा रयतेचा जोर की ज्यास कबूल करितील तो मेंबर होतो. ज्यास बरतर्फ करितील तो जातो. असा प्रकार या पार्लमेंटचे मेंबराचा आहे. आणि मेंबर होण्याबद्दल आपले पदरचा पैसा हाजारोच रुपये खर्च करून मेंबर होतात. आसा हा अनाहूत चमत्कार पाहिला. या बोलण्या समई गेलो तेव्हा सर्वांनी पुकारा करून सलाम केले. कितेक गलबला करून मेंबरासी सवाल केले की सातारच्या राजाचे मोकदम्यास तुम्ही मेंबर जाहल्यावर पोट घाल किंवा नाही, असे मोठ्यानी वोरडून कितेक बोलले. थोडासा हसील या मेंबर होण्याचा द्रिष्टीनी पाहिला तो सरकारात वर्दीस लिहिला. असी येक दिली व रयतेची कुदरत सबब याचे राज्याची बढ़ती आहे." (ता. ३१ जुलाई सन १८४७ पत्र.)
धैर्याचा मेरू रंगोबा
पालमेण्ट नि कंपनीची वरिष्ठ कोर्ट यांच्या पाषाण हृदयाला पाझर फोडण्याच्या रंगोबाच्या खटपटी सारख्या चालूच होत्या. महाराजांची प्रकृति गुणावह काही बिलकूल नाही, धैर्याचे पुरुष इतकेच मानावे अशी पत्रे येतच होती. बाहेरचा प्रचारकार्याचा, सह्या मिळवण्याचा आटारेटा चालूच होता. पदोपदी निराशा नि निरुत्साह त्याला धमकावीत होते, तरीहि तो निर्धाराने प्रयत्नांची कडेलोट शिकस्त करीतच होता. ता. ११ नवंबर १८४७ रोजी रंगोबाने कॉमन्स आणि दोन्ही कोर्टाना पुन्हा एक याद पाठवून, त्यांत काशीच्या खराब हवेत महाराजांची प्रकृति ढासळत चालली आहे. निदान माणुसकीला स्मरून तरी आम्हाला न्याय द्या, अशी मागणी केली.
"महाराज, माझ्या छत्रपति धन्याबद्दल मला जेवढे काही करता येण्यासारखे होते, तेवढे मी आजवर केले आहे. ताज्या आलेल्या डाकेवरून महाराजांची प्रकृति दर दिवशी खंगत चाललेली आहे असे समजते. त्यांच्यावर हकनाहक लादलेल्या आरोपांचे खंडन झालेले पहाण्यास ते जगतात किंवा कसे, देवाला माहीत. माझ्या ७ वर्षांच्या धडपडीना यश आलेले पहायला आणि अखेर न्याय झाला हे समाधान उपभोगायला छत्रपति जिवंत रहातात, अगर न्याय न मिळताच वैऱ्यांच्या कारस्थानाना बळी पडतात, काय होईल कोणी सांगावे? पण एक मात्र निर्धाराने सांगतो की दोहोंपैकी कोणतीहि घटना घडली, तरी मी मात्र जो ठाण मांडून येथे बसलो आहे, तो मेल्याशिवाय येथून हालणार नाही. ज्यांच्या हातात आज सत्ता आहे त्यानी आजवर जरी आमचा धिक्कार केला, न्यायाचे सारे रस्ते आडवून धरले, तरी जी ब्रिटीश जनता उदारपणा, न्याय आणि समतेची भोक्ती आहे, ती आम्हाला अखेर न्याय दिल्याशिवाय रहाणार नाही, अशी माझी खात्री आहे."
रंगो बापूजी ज्या क्षणाला ही यादी लिहीत होता, त्या क्षणाला त्या बिचार्याला काय कल्पना की तिकडे २८ दिवसांपूर्वीच त्याचा धनि छत्रपति प्रतापसिंह ता. १४ आकटोबर १८४७ गुरुवारी दुपारी ३ वाजता स्वकीय परकीय हरामखोरांच्या छळवादांतून मुक्त होऊन स्वर्गलोकी गेला ते! त्या काळीं तारायंत्र नव्हते नि सुएझचा कालवाहि जन्माला आलेला नव्हता, तेव्हा ही दुक्खाची बातमी रंगोबाला नि दोस्ताना कळायला डिसेम्बर उजाडला.
‘मोठी नामदार दोन मनुषे’
काशीला राजाचा कैलासवास झाल्याची कल्पनाहि नसलेल्या रंगोबाने ता. २ डिसेंबर १८४७ च्या आपल्या पत्रात- ‘‘कपतान राबर्ट कोगन साहेब याची पांचसात दिवस प्रकृत बिघडून ता. २६ नवंबर रोजी काल जाहाला ईश्वरे मोठा घात केला.’’ ही बातमी कळविली. थोड्याच दिवसांपूर्वी कर्नल रॉबर्टसनहि दिवंगत झाल्याचे वृत्त याच पत्रात लिहून, ‘‘सरकारचे कामातील मोठी नामदार दोन मनुषे जनराल राबर्टसन व कपतान कोगन गेले, तीन दिवस निश वारंवार स्मर्ण होताच श्रमी होणे, असे दिवस गुजरले पुढे भरवषाचे आणि भाषा जाणणारे दुसरे कोणी नाहीत." असे कळवले होते. कॅपटन कोगनच्या मृत्यूने तर रंगोबा अतिशय दुक्खी झाला. मुंबई सरकारच्या गुप्त हेराना नि त्यांच्या डावपेचाना सफाईत बगल मारून, अफगाण इराण-इराकच्या मार्गाने लंडन गाठण्याच्या कामी कोगनच त्याच्या कामी आला.
रंगोबा लिहितो- "ज्यान मिलन याणी कोगन यासी बोलून सन १८३९ साली सरकारचे काम त्याचे हाती देऊन, मला त्याच्या स्वाधीन करून, डाकतरनी माझा हात धरून कोगनचे हातात घालून सांगितले, की माझे माहातारपण आणि मुंबई गवरमेंटानी खोटे तरकट करून राजास पेचात आणिला. त्याविसी येथे काही होत नाही. याजकरिता हे काम तुम्ही लंडण मुकामी दरबारात चालऊन राजास, इनसाफ देऊन बंदोबस्त आम्ही आसता जाहाल्यास नीट आहे. अथवा आमचे मागे तुम्ही ते काम व रंगो बापूजीस हातचे न सोडिता (करावे). कोगन याणी उत्तर केले की माझा जीव आहे तोपावेतो राजाचे काम रंगो बापूजीस घेऊन चालवीन. सरकारचे मोकदम्याचे काम कोगन साहेबानी आठ वर्षे निरलाभपणे आपले ज्ञातीची उपहास या कामात होऊन बेआबरू होईल, हे काही येक चितात न आणिता, सरकारचे खरे कामाबद्दल अवलीपासून आजपर्यंत आपले ज्ञातीची द्वेषी जाहाले व या कामाबद्दल त्यास गवरमेंटानी मोठ्या दरज्याची व मोठे पगाराची चाकरी देत होते, परंतु कबूल न करिता सरकारचे काम चालविले, असे भरवश्याचे आणि साफ दिलानी कोगननी काम चालविले, हे सत्ये आणि यास ईश्वरच साक्ष आहे."
अखेर ते पत्र आले!
काशीहून ता. १९ आकटोबर १८४७ ला प्रतापसिंहाच्या मृत्यूची खबर देणारे यशवंत मल्हार चिटणिसाचे पत्र लंडनला रंगोबाच्या हाती ता. ४ डिसेंबर १८४७ रोजी पडले. ज्याच्यासाठी रंगो बापूजीने गेली सात वर्षे लंडनात ठाण मांडून अनंतमुखी प्रयत्नांचा पर्वत उभा केला स्वताच्या घरादाराची बायको पोरांची, भविष्याची कसलीहि पर्वा न करता ज्या एकाच कार्यात तो एकतान रंगला, तोच छत्रपति प्रतापसिंह कालवश झाल्याची बातमी समजताच रंगोबा दोन तास बेशुद्ध पडला. या महत्त्वाच्या पत्राचीहि एक भानगड झाली. काशीला इंग्रजी लिहिणारा जो माणूस ठेवलेला होता. तो (हणमंतराव पवार) अलिकडे सातारी फंदाने डागळलेला होता. त्याने पत्रावर रंगोबाचा नेहमीचा लंडनचा पत्ता (९ ब्लैण्डफर्ड प्लेस, पार्करोड, राजण्टस पार्क, लंडन) न लिहिता. सौथहॅम्प्टन लिहिले. मागाहून कोणीतरी ते खोडून त्यावर मार्सलिस लिहिले. अर्थात ते ठिकठिकाणी टपला खात अखेर रंगोबाच्या हातात आले. चिटणीसाने २० आकटोबरला पाठविलेल्या पत्राची हीच दशा. ते पत्र त्याला ७ डिसेंबरला मिळाले. याविषयी, "हा माणूस आणखीहि फंद माजवील आणि तुम्हा सर्वास आयास पाडील, तेव्हा त्याला काढून टाकावा." अशी रंगोबाने चिटणिसाला स्पष्ट सूचना दिली.
महाराजाच्या मृत्यूविषयी रंगोबाने आपले विचार आणि पुढच्या कार्याची दिशा ता. ६ आणि ७ डिसेंबरच्या विस्तृत पत्रानी चिटणिसाला कळविली. "आंगावरील वस्त्र नाहीसे होत तोवर मी येथे इनसाफासाठी लढा देत रहाणार" असा निश्चय कळवून, रंगोबा म्हणतो- "असा हा समय गुजरला. हा मृत्युपंथ आहे. मनुष्याच्या स्वाधीनची गोष्ट नाही. आपण व सर्वत्र लहानथोर मंडळीनी विचार करून एकदिली ठेऊन महाराजांचे जागी शाहू महाराज व मातुश्री राणीसाहेब महाराज यांचे दुक्ख विसरऊन, महाराज छत्रपतींच्या मागे त्यांचे पदरचे मंडळीनी हिंमत धरून, कार्य शेवटास नेहले हा लौकीक करून दाखवावा. नाहीतर महाराज जाताच चार चहूकडे होऊन काम बुडवून पदरी कोणी मनुष नाही असे मात्र न व्हावे, इतके मागणे मी जिवंत आहे तो सरकारचे हुकुमाप्रमाणे क्रम चालवीन. मी मेल्यामागे दुसरे कोणी या ठिकाणी पाठवून क्रम चालवावा... सारांष, जनात पदरचे मंडळीचे हासे न होईल, हे नजर ठेवून सावध राहावे.”
प्रकरण २७ वे
“राजा मेला, तरी न्याय मेला नाही."
“जर मी रडत बसलो तरी पुढील परिणाम काय?" असा विचार करून रंगोबा आपल्या दोस्ताना भेटला. "कष्ट केलेले, हा असा प्रसंग गुजरला राजाचा मोकदमा निरम बैगुन्हा जाला, काम नेटास येऊन घात जाहाला. त्यास आता तुम्ही जाणार किंवा कसे करणार? उत्तर, मी जावयाचा नाही. इनसाफाचा सेवट तुमचे हाते व्हावा. नंतर तुम्हापासी खर्चास काही आहे नाही, येविसी कसे करणार? उत्तर कर्जवाम करून दिवस काढीन. नंतर बोलले, राबर्टसन व कोगन दोघेहि गेले. आता खर्चाची मदत कर्जवाम काढण्यास देण्यास अशा समई कोण आहे? नंतर मी सांगितले, जसे होईल जसे निभेल त्या रीतीनी मी गुजरीन. परंतु उगीच उठोन जाणे अथवा लाच्यारीने कोर्टापासी ऐवज मागणे अगर घेऊन जाणे व्हावयाचे नाही. आपण अवलीपासून आज पावेतो मेहनत केली. मी राजाचा चाकर इनसाफाविसी आलो. त्याप्रो इनसाफाची तजवीज करावी. नंतर बोलले, आमचे हाते जितके होईल तितके करू."
ईश्वरानी या मुकामी सर्व काम दोस्ताचा दिल व नये पारलमेट तेहि लवकर बसेल असे योग्य आले असता, छत्रपति कैलासवासी जाहले. त्यायोगे सर्वस्वी घात जाहला. पुढे कोणता परिणाम, काय तरकटी जबाब देतील, याचा नेम नाही. परंतु दोस्तास समजाविले, राजा कैलासवासी जाहाला, परंतु इनसाफ मेला नाही, जिता आहे. ईस्ट इंडिया कंपनीहि मेली नाही, जिती आहे. त्यास इनसाफ मागण्याबाबत मी या मुकामी जिता आहे. अखेर इनसाफ मागण्यास महाराजाचे चिरंजीव आहेत. त्यास इनसाफ द्यावा. त्या प्रमाणे उत्तरे निरोत्तरे दोस्त मंडलीस केली. नंतर, या मुकामी एक मोठा लाड याजवर दुरनिमित्ये ठेउन तो लाड मरून शंभर वर्षांपासून दीड वर्षांचे आत त्याचे पुत्र नातू पणतूनी त्या लाडाचा मोकदमा चालवून फौसल करून घेतली, असे आहे. राजा मेला परंतु मोकदमा चालेल, असे बोलून क्रम चालवणे सुरु कर्णे ठरून, निकडीने तीनचार दिवसाचा नेम ठरला आहे. यात काय ईश्वर काय करील ते खरे.
प्रतापसिंहाचे रंगोबाला गुप्त पत्र
श्री.
राजश्री रंगो बापूजी यासी आज्ञा केली ऐसीजे. इकडील प्रकृत या खराब हावेमुले फारच शक्तहीन जाली. तेव्हा शरिराचा भरवसा वाटत नाही, याजकरिता तुम्हास कलावया करिता आमचे दोन संकल्प सेवटास नेहण्याविसीचे लिहितो. येक, आमचे सातारचे राज्याचे दाव्याविसीचा मोकदमा विलायतेस तुम्ही व दोस्तमंडलीनी चालविला आहे. त्याप्रमाणेच आमचे पश्चात तुम्ही चिरंजीव राजश्री शाहू महाराजाचे नावानी सदरहू मोकदमा चालऊन, फैसला करून घेऊन, चिरंजिवाचे नावे राज्ये चालवावे. दुसरे, आमचे वडील घराणे उदेपूरचे महाराणाजी याचे दियारे राजे लोक आमचे शरीरसंमधी याच्या घरी मुलीचा शोध करून चिरजिवाचे लग्न कराये हे दोन नेम पूर्ण व्हावे. त्यास हली वेदशास्त्रसंपन्न राजश्री सिवानंद शास्त्री यास शरीरसंबंधाचे बोलण्यास उदेपुरास रवाना करण्यासमई आमचे चित्तास दुक्ख वाटून आमची राणी व कन्या वगैरेचे समक्ष आम्ही शास्त्रीसी बोललो की आमचे दोन संकल्प सदरी लिहिले ते सेवटास नेहण्यास घरात पाहावे तो राणी ही बायको माणूस.
पुत्र तर आज्ञे लेकरू. तेव्हा आमचे इमानदार भरवशाचे सेवक लोक हे आमचे मागे सेवटास नेहतील किंवा नाही म्हणोन दुक्ख वाटते. तेव्हा बाबाजीनी (यशवंतराव चिटणिसाने) सदरहू दोनी संकल्प सेवटास नेण्याचे कबूल करून भाद्रपद व १० रोजी शफत करून इकडील खातरी केली. तेव्हा येथील बंदोबस्त जाहला. परंतु विलायतेचा मोकदमा तुमचे सिरावर. सबब तुम्हास हा मजकूर माहीत आसावा. दुसरे, तुम्हास विलायतेस रवाना करण्याचे ठरून सातारा मुकामी देवघरात सरकारचे समक्ष तुम्ही इमानानी चाकरी करीन म्हणोन श्रीची शफत केली आहे. तोहि मजकूर परस्परे माहीत आहे. त्यास आमचे मागे राणी ही बायको मनुष, यास कंपनी सरकारचे कामगारानी हरयेकविसी इजा देऊन, हरकोणा मनुषापासून भीती घालून, ही बायको मनुष घाबरून, नहून जर आमचे सातारच्या राज्याचा दावा खुटऊन पुन्हा बोलू नये म्हणोन जर त्याणी लिहून मागितल्यास आणि न जाणो त्याप्रमाणे राणीनी कबूल करून आपले नावे आगर आमचे पुत्राचे नावे राज्याचे बोलत नाही म्हणोन लिहून दिल्यास आम्ही राणीचे भ्रतार, पुढे जे गैरसिस्त काम व दस्तायैवज वगैरे जाहाल्यास रद करून हे पत्र लिहितो.
कारण यात आमचे वंशाची आबरू जाऊन दुरलौकीक मोठा होईल, म्हणोन आम्ही राणीस बहुत वेला सांगितले आहे. परंतु न जाणो, आमचे मागे कसा प्रसंग पडेल याचा नेम नाही. त्यात प्रकृत ही विथर होत चालली, हे लिहिलेवरून तुम्ही घाबरू नये. आणि ईश्वरी कृपेनी तुम्हास आयुष पुरून विलायतेस सदरहू मोकदम्याचा सेवट होई तोपर्यंत तेथे हजर असता, नहून जर राणीनी हर कोणाचे सांगण्यावरून इकडील भरंवशाचे एक इमानदार सेवक लोक कामातून गालून व तुम्हास परत देसी येण्याविसी लिहून पाठऊन, राजकारणी कामाचा खराबा करून, पोटासाठी आमचे सातारचे राज्याचा दावा वगैरे खुटऊन, कंपनी सरकारास जर लिहून दिल्ह्यास, इकडील भरवशाचे इमानदार सेवक लोक व तुम्ही प्राण गेला तरी कबूल करू नये. गैरशिस्त लिहिणे राज्ये बुडविण्याचे रद करून तुम्ही इकडील हुकुमानी मुखत्यारीने इंग्रेजी सरकारचे दरबारात बोलून समजावे की हिंदू धर्मात बायकोनी लिहून देणे रूढी नाही. त्यास राणी ही बायको मनुष. यानी राज्याचा दावा खुटऊन लिहून देणे आधिकार नाही, तेव्हा जे लिहून दिल्यास ते रद आहे.
राणीनी खासगीचा दरमाहा घेऊन त्याची खासगी असेल त्यात मुखत्यारीने जीवमान पावेतो करावे. परंतु राज्याचे कामात फसावा केल्यास, पुढे साफ पाहण्यास व हुकूम कर्ण्यास आधिकार नाही. तरी तुम्ही व भरवश्याचे इमानदार सेवक लोकानी राज्याचे काम चिरंजीव राजश्री शाहू महाराजाचे नादानी, त्याची उमर वीस वर्षाची होऊन, सर्व राजकी कामास वाकब जाहल्यावर त्याचे ते मुख्त्यारीने भरवश्याचे नोकर लोकांचे हाते राज्ये चालवावे. कारण इकडून जाहागीरदाराविसी ता. २५ सप्टेंबर सन १८१९ चे तहनाम्यावरून दोस्तीने बोलत असता, खोटे फितुरी तुफाने उभी करून, आम्हाकडे गुन्हा नसता. इनसाफ न करिता, जबरीने राज्यावरून काढून, धाकटे बंधूस बालाजी नारायेण याणी फितऊन, त्यास राज्यास अधिकारी करून नातूनी लाच इनामगाय दहा बारा हजाराचे घेतले हे जनजाहीर आहे. आसी खोटे कामे फायद्याबद्दल मुंबई गवरमेंटानी केली.
हा चितात मोठा आदेशा येऊन, हे राजकारणी काम जाणून, आम्ही कायम आहो तोच लिहितो. कारण आमचे पश्चात सदरी लिहिल्याप्रमाणे राज्याचे बेदाव्याचा कागद मिलण्याबद्दल प्रयत्न करून फसविण्यास कमी करणार नाहीत. पहिले कामदार आबरूस भिऊन खरेपणानी चालत होते. हली कंपनीचे कामगाराची चाल पेशजी प्रमाणे बिलकूल कायम राहिली नाही. हे आमचे आनभवास बजिनस आले आहे. त्याजवरून हे भविषोत्तर मजकूर लिहिला, तरी तुम्ही हे पत्र तूर्त गुप्त ठेवावे व येथेहि हावे असेच कारणीक कागद ठेविले आहेत. कारण न जाणो राणीनी धैर्य न पुरता राज्याचा बेदावा लिहून दिल्यास तो रद करण्यास तुम्ही इंग्रेजी सरकारचे दरबारात या पत्राचा मजकूर जाहीर करून, येक नकल राणीकडे पाठऊन, सदरहू पहिले तहनाम्याप्रमाणे राज्ये चिरंजिवाचे नावानी चाले, येविसीचा बंदोबस्त इंग्रेजी सरकारातून करून घेणे. जाणिजे, छ २४ सवान सु।। समान आर्बईन मयातैन व आलफ मु. ता. ५ आगटोबर सन १८४७ इसवी बहुत काय लिहिणे"
मृत्यूच्या पूर्वी अवघे ९ दिवस प्रतापसिंहाने स्वता लिहून मोहोरबंद केलेले हे गुप्त पत्र आणि त्याच्या मृत्यूची खबर देणारी चिटणिसाची दोन पत्रे रंगो बापूजीला एकाच डाकेने मिळाली. पाठोपाठ बाल छत्रपतीचे एक पत्र आले. त्यात तो लिहितो- “श्रीक्षेत्र कासीनजीक छयावणी मुकामीहून ता. १ नवंबर सन मजकुरचे आज्ञातपत्रात मजकूर की आम्ही आश्वीन वद्य ७ शनवार शके मजकुरी या रोजी [३० आकटोबर १८४७] सुमुहुर्त वडिलांचे अधिकार सांप्रदाया अन्वये स्वीकारिला, तुम्हास कलावे. वकिलानी येथे तख्त केले होते त्याजवर बसलो. सर्व पदरचे मंडलीच्या नजरा नजराणा जाले व कासी मुकामी सर्व या देशाची इकडील पदरचे मंडली लहान मोठी याचे कारकून आहेत त्यास व राजेरजवाडे यास व नेपालकर माहाराज छत्रपति याचे उभयेता पुत्र व राणी आहेत त्यास व क्षेत्रचे मोठे लोक व बाबू वगैरे यास आमंत्रणे या समारंभाबाबत केली, ते लोक सर्व आले. नजरा करणे यानी नजरा केल्या. व खिलत देणारे याणी खिलत नेपालचे उभयेता मुलेहि येऊन पोशाख दिल्हे. समारंभ फार चांगला जाहाला. इकडील इराद्या अन्यये तोफाची व बाराची सरबती करविली." हे पत्र मस्तकी वंदन करून सेवकास मोठा आनंद जाहाला.
पायाखालची वाळू घसरू लागली. समुद्राला ओहोटी लागली का किनाऱ्यावर लाटांचा थैमान प्रचंड असतो, पण पाण्याच्या ओढीबरोबर वाळूचे पाटहि भयंकर जोराने आत खेचले जात असतात. पटाईत पोहोणारेसुद्धा ओहोटीच्या सुमाराला समुद्रात पाऊल ठेवण्याचे धाडस करीत नाहीत. थेट हीच अवस्था सातारा नि काशी प्रकरणाना आली होती. रंगो बापूजीचा आशावाद केवढाहि दुर्दम्य असला, तरी त्यालाहि आता एकंदर भविष्याचा रागरंग स्पष्ट दिसत होता. त्याच्या काशीच्या डाकेतील पत्रांचे प्रमाण आता बरेच वाढले. पत्रेही बारीकसारीक सूचनांनी नि सावधगिरीच्या इषार्यानी लांबलचक लिहिली जात. मेजर कारपेण्टरच्या जागी आलेला मेजर मॅकग्रेगर एजण्ट म्हणजे अर्कट असामी होता. मी जेलर नि हे सातारचे राजकुटुंब म्हणजे गुन्हेगार कैदी, अशा दिमाखाने तो वागत असे. प्रतापसिंह हयात असतानाच, सातारच्या नातूशाही कारस्थानांची भुतावळ गुप्त रूपाने त्याच्या परिवारात येऊन घुसलेली होती. काशीला होईल ती हकिकत नातूचे हे हेर गुप्तपत्रे पाठवून सातारला वेळच्या वेळी कळवीत असत.
हणमंता पवार नावाचा एक इसम प्रतापसिंहाने स्थापन केलेल्या सातारच्या पाठशाळेत इंग्रजी लिहा वाचायला शिकलेला होता. काशीला यशवंतराव चिटणिसाच्या हाताखाली इंग्रजी पत्रांच्या नकला करायला, पत्ते लिहावयाला, थोडे भाषांतर करायला एक माणूस हवा होता. या पवाराने त्या जागेसाठी सातार्याहून अर्ज करून आपली नेमणूक करून घेतली होती. जातीचा मराठा म्हणून महाराजानी तात्काळ त्याला बोलाऊन घेतले. पण बेटा होता नातूचा पगारदार हेर, रंगोबाचे विलायतेचे टपाल यायचे जायचे त्यातला सारा मजकूर या हणमंत्याला साहाजीकच प्रत्यक्ष समजायचा. लगेच त्याचा तपशील तो सातार्याला रवाना करायचा.
लंडनला जाणाऱ्या हुंड्यांच्या रकमाच्या रकमा मधेच गटायस्वाहा करण्याइतकी पवाराने मजल गाठली. हुंड्या रवाना केल्या आहेत, असा मजकूर तेवढा रंगोबाच्या पत्रांत असायचा, पण हुंडया नेमक्या बेपत्ता! रंगोबाची चौकशी यायला लागायचे ३ महिने नि जबाबाचे ३ महिने. तेवढ्यात पवाराच्या सबबी तयार असायच्या.
हणमंता पवाराने मधच्यामधी हुंड्यांच्या रकमा हबकण्याचे कर्म केल्यामुळे, चिटणीसाने थॉमसनच्या तक्रारीबद्दल रंगोबाला जरा कडक लिहिले. त्याने हणमंत्याची हरामखोरी स्पष्ट कळवून, वर लिहिले की (ता. २४-६-१८४८) "येथील खर्चाचा दरमाह यैवज येतो त्यास खर्चाची व्यवस्था तसा नेम पेशजीचा आहे त्याप्रमाणे खर्चास घेतो. त्याचा त्यास पावता करितो. आसे आसता मजकडे न लिहिता, त्यास परभारे लिहिता, ही दिवाणगिरीची सीस्त आरंभिली आहे. हेहि योग्य आहे. जर मर्जी आसल्यास मजकडे यैवज पाठवू नये. तेथून बंदोबस्त कर्णे असेल तसा करावा. मी जर निमकहरामी करितो तरी नातूपेक्षा इनाम गाव व द्रवहि मिलत होते. हालीहि कुलीनपणा सोडून भी प्रय्यावर नजर ठेवीन तरी मोठया संतोषानी आणि आर्जवानी देतील. परंतु आश्या कर्माचा हा देह नाही. ईश्वरी कृपेनी चांगले व्हावे, ही इच्छा, यासमई विलाज नाही. माझे प्रालब्धानी थोरले सरकार आसते तरी विनंती लिहितो आगर रजाच मागतो. परंतु मातुश्रीसाहेबास व आपलेस माझे रहाण्याचा संतोष नसल्यास लिहून पाठवावे, त्याप्रमाणे करीन. हे काम येकाचे धोरणाचे नाही. यैवज कोणाचे मेहेनतीने मिलतो आणि बक्षीस कोण खातो हाच परिणाम अखेरीचा आहे." सारांश, खर्चाच्या बाबतीत रंगोबाची माथेफोड अखंड चाललेली होती.
दुसरे चिंतोपंत भाटे म्हणून एक गयावळ्या तोंडाचे भटजीहि काशीला येऊन महाराजांच्या परिवारात पंक्तीचा पुक्खा झोडीत होते. व्रण सापडला का तेथे टोच मारायची, हा काकसंप्रदाय या ब्रम्हमुखोत्पन्न महाप्राण्याने काशीला चालविला होता.
महाराजांचा मृत्यू होताच, या गुप्त कटबाजांचे चांगलेच फावले. तशात आता तर मॅक ग्रेगर सैतान एजंट म्हणून आलेला. यांची त्यांची जानीदोस्ती जमली, पहार्यावरच्या शिपायांतहि चिंतूभटाने बंडाचे बी पेरून ठेवले होते. एकदा यशवंतराव चिटणीस काशी शहरात मेण्यात बसून कामासाठी गेला असता, परत येताना वाटेत एकाकी छावणीतल्या २५-३० हत्यारी शिपायांनी भररस्त्यांत त्याचा मेणा आडवून, पगाराच्या थकबाकीची मागणी केली. इथच्या इथे पगार चुकवा, नाहीतर परिणाम वाईट होईल, असा दंगा चालू केला. चिटणिसाबरोबरहि हत्यारी शिपायी होतेच. त्यानी तलवारी उपसल्या. पण यशवंतरावाने त्याना स्वस्थ उभे रहाण्याचा हुकूम दिला. ‘ज्यांचे पगार थकले असतील, त्यानी नगरिगर एजंटाच्या कचेरीपुढे जमावे, तेथे हिशोब करून पगाराचा फडशा करतो.` असे दंगेखोराना बजावले. हे परवडत नसेल तर काय वाटेल ते करून घ्या, असे सांगितले.
इतक्यात ही दरगांची बातमी छावणीत जाताच, राणीने काही हत्यारी शिपायी मदतीला पाठविले. त्याना पहाताच दंगेखोर पळाले. चिटणिसाने झाला प्रकार राणीला कळविताच, तिने लागलीच सगळ्या दंगेखोराना बोलावले. आमचे आठ वर्षांचे पगार दिलेले नाहीत म्हणून रस्त्यावर दंगल माजविणाऱ्या एकाहि गुडाला आठ महिन्यांचाहि पगार न मिळाल्याचे सिद्ध करता आले नाही. राणीने जागच्या जागी सुमारे १०० आसामींचा रुजु दिवसांचा पगार देऊन, त्यांचे कपडे नि हत्यारे काढून घेतली नि त्याना जागच्या जागी डिसमिस करून छावणीच्या बाहेर हुसकावून दिले. हा प्रकार पहाताच मॅक ग्रेगर सुद्धा राणीच्या तडफदारीने थक्क झाला. या भानगडींत रामजी खडसरे म्हणून एक मराठा पुजारी सापडला. त्याचीहि राणीने लगेच सातार्याला पाठवणी केली. थोड्याच दिवसांत चिंतुभट आणि `इंग्लिश-रायटर` हणमंतराव पवार यानाहि पहारेकऱ्यांचे धक्के खात काशीला रामराम ठोकावा लागला. तरीहि जाण्यापूर्वी त्यानी राणीवसाच्या एकदिलीत बेकीचे वीष पेरायला कमी केले नाही. राणी नि राजकन्या गोजराबाई यांचे अलिकडे जमेनासे झाले. रोज तंटे होतं असत. सातारला आप्पासाहेब अत्यवस्थ आजारी असल्याच्या बातम्या रोजच्या रोज येऊ लागल्या. प्रतापसिंहाचा मृत्यू होताच, दरमहा येणारी दहा हजाराची नेमणूक एकदम बंद झाली. ३ नवंबर १८४७ ला राणीने एजंटा मार्फत ग. ज. ला पत्र पाठऊन चौकशी केली.
त्याचे लेखी उत्तर तर आलेच नाही. पण एका दिवशी एजंट मेजर मॅक ग्रेगर साहेबाने गुरगुरत तोंडी खुलासा केला की “ती नेमणूक महाराजांच्या पुरतीच होती. आता राणीला दरमहा रु. ८०० तैनातीच्या लोकांसाठी रु. २,५०० आणि आणि राजकन्या गोजराबाईला रु. ५०० फक्त मिळत जातील. राजाच्या उत्तरक्रियेसाठी ५०,००० हजार रुपये खर्च झाला तो सरकारातून पाठविला आहे. तो आणि तुमच्या या नेमणुकांची रकम घ्या.’’ राणीने उत्तर क्रियेसाठी काशीच्या सावकारांकडून कर्ज काढले होते, म्हणून ती रकम तेवढी घेतली आणि मासिक नेमणुकीची रकम स्पष्ट नाकारली. अर्थात खर्चाची ओढाताण चालू झाली. अशातच एजंटने गोजरबाईला कानमंत्र दिला कीं तुम्ही आत्ताच काही खटपट कराल तर आप्पासाहेब मृत्यू पावताच तुमच्या बापाचे सातारचे राज्य तुम्हाला मिळण्याची संधि आहे. या भुलावणीच्या मागे सातारी नातूचे धागेदोरे हालत होते आणि त्याचे हेर छावणीत होतेच.
गोजराबाईने काशी शहरात निराळी जागा घेऊन स्वतंत्र चूल पेटवली. एकदिलाने वागून दत्तक शहाजी राजासाठी विलायतेचा मोकदमा निश्चयाने लढविण्याच्या प्रतापसिंहाच्या मृत्यूशय्येवर केलेल्या आणाभाका गेल्या उडत हवेत आणि स्वार्थाच्या भावना बोकाळल्या. या सगळ्या गोष्टी रंगो बापूजीला दर डाकेने कळत होत्या. पण तो एकटा परदेशी करणार काय? त्याने पार्लमेंटाशी झगडे द्यायचे का, काशीच्या घरच्या फाटाफुटीना तोंड द्यायचे? दुष्ट लोक पदरचे मंडलीत आगर सरकारचे खासे मंडलीत हाली कमी पक्ष पाहून तरकटे मुंबई व सातारियाकडून करण्यास कमी करणार नाहीत. त्यास सर्वांनी येकदिलाने चालावे अशी विनंती करण्यापलिकडे त्याच्या हातात काय होते?
हॉबहौसचा डलहौशीला आगाऊ इषारा
प्रतापसिंहाचा मृत्यू होताच कंट्रोल बोर्डाचा चेअरमन सर जॉन हॉबहौस याने २४-१२-१८४७ ला लॉर्ड डलहौशीला गुप्त खलिता पाठवून समजावले की ‘‘पदच्युत राजा मेला. ठीक झाले. तो सातारचा सध्याचा राजा अत्यवस्थ आहेच. थोड्याच दिवसांत तोहि वांझोटा राम म्हणणार. तेव्हा त्याने इतक्यात दत्तकबित्तक घेण्याची भानगड केली तर त्याला स्पष्ट परवानगी देऊ नका. घेतलाच तर काशीच्या दत्तकाप्रमाणेच, तो जुमानू नका. तो आप्पासाहेब मरताच ते सातारचे राज्य एकदम खालसा करून आपल्या ब्रिटीश साम्राज्यात जमा करून टाका. ही सातारची कटकट पुन्हा कोणत्याही रूपाने माझ्या कानावर येता कामा नये, अशी माझी इच्छा आहे."
रंगो बापूजी जागाच होता. त्याचे कान दहा दिशांना टौकारून सगळे आवाज ऐकत होते. त्याने हॉबहौसच्या डाकेच्या पूर्वीच एक महिना काशीला यशवंतराव यास गुप्तपत्राने कळविले होते की-"कोर्ट डरेकटरस याचा मतलब नजरेस येतो की माहाराष्ट्र राज्ये बुडऊन आपले घरात घालावे. कोर्टाची इच्छा राजा (आप्पासाहेब) मरावा. दत्तक न द्यावा. राजानी (प्रतापसिंहाने) दत्तक घेतला, हा कबूल न करावा. सारे राज्य आपले घरात घ्यावे. हिंदूचे राज्य बुडवावे. आसा क्रम सुरू आहे. परंतु ईश्वर कस करतो ते पाहावे. हा समय औरंगजबियाचा, जसे सर्व हिंदू बुडवावे, तसा आहे. ईश्वर हिंदू राज्ये बुडवील असे घडणार नाही. कारण औरंगजीब या क्रमात मेले, सेवटी हिंदु लोक राज्येसुद्धा कायम आहेत. आसेच ईश्वर करील असे वाटते. याजकरिता हिंदू मंडलीतील सर्वत्र दोस्त अगर दुषमान पाणी पुर्त दिलात आणावे आणि हिंदू धर्म संरक्षणावर नजर ठेऊन सर्वत्रानी कृपा करून येकदिलीने जसी ज्याचे हाते मदत होईल, त्याप्रमाणे करावे हे मागणे आहे.
चोराचे टोलीस आबरू गैरआबरू पहाण्याची गरज नसती. कसाहि फायदा झाला म्हणजे झाले. त्याना हे ईष्ट. इंडिया कंपनी बनिया व्यापारी याचे नौकर कोर्ट डरेकटरस याची रीत मारवाडी लोकाप्रमाणे आहे. जबरदस्त जबरी करिते तरी बेहत्तर. परंतु भरवसा वचने देऊन, माणसास करार मदारात गुतऊन, अखेर तेच तरकट करून, खोटा टपका ठेऊन, बुडवून, सर्व आपहाराची इच्छा महाराष्ट्र राज्य बुडवावे, हिंदुधर्म उच्छेद करावा आसा क्रम मनोभाव नजरेस येतो. या लोकास भ्याले किंवा नरमाई दाखविली म्हणजे तात्काल गला कापतात. दूरचे दूर सख्त खरेपणानी बोलणे जेव्हाच्या तेव्हा जाहले म्हणजे जबरदस्त लाच्यार होतात. तूर्त राज्य नाही. मग नरमाई व आर्जव कर्ण कशास पाहिजे?"
शंभर वर्षापूर्वी रंगो बापूजीने आंग्रेजी मनोवृत्तीचे काढलेले हे चित्र हिंदवी मनोवृतीला पटायला शंभर वर्षे लागली. रंगोबाने त्याच वेळी स्पष्ट इषारा दिला होता की- “माझे लिहिण्याचा बेभरवसा मानू नका. न जाणे अंदेशा आल्यास, हे लिहिणे खरे किंवा खोटे, हे माझे देहसमाप्ती जाहल्यावर पुढे नजरेस येईल."
लंडनातले चार्टिस्टांचे बंड
सन १८३२ च्या रिफॉर्म बिलाने ग्रेट ब्रिटनातल्या कामकरी मजुरदारांच्या संघटनेला दिलेले राजकीय हक्क अपुरे आहेत, अशा सबबीवर अखंड चळवळ करणारी चार्टिस्ट संघटना होती. रंगो बापूजीचे या नि असल्या चळवळींकडे विशेष लक्ष असायचे. ता. २४ एप्रिल १८४८ च्या पत्रात तो काशीला लिहितो.-
‘‘३. इंगलीष मुलुखीचे लोक वजीरास नापसंद करून आर्ज्या करीत आहेत. पारलमेंटचे कायदे जे काही गैरलायक कायद्याची कलमे आहेत, त्यापैकी एक कलम लिहून कलवितो, वजीर लोकानी मनास आले तसे काम करावे. ते खरे आहे. आगर खोटे आहे. याची चौकसी न पाहता पारलमेंटचे मेंबर आपले संमत वोट वजिरास देऊन रयेतेस दुक्ख देतात. आसी कितेक कलमे रद करण्याबद्दल च्याटीस (चार्टिस्ट) म्हणोन बहुत लोक हे जुने कायदे तोडून नवे कर्णारि याची आज पारलमेटास ता. १४ येप्रेल रोजी गुजरते समई गवरमेट फौजताफा जागोजागी नाकेबंदी करून, काही तंट्याचे निमित्ये करून, च्याटीस लोकास मारावे, या प्रमाणे तयारी करून, सारे शहरची दुकाने लाऊन, बंदोबस्त जाहाला. परंतु च्याटीस इंगलीष लोकानी दंगा न करिता पारलमेटात जाऊन आर्जी गुजरली. त्याजवर सह्या सुमारी वीस लाख जाहाल्या छ्यापिल्या आहेत. हा तटा मोठा पडला आहे. या तंट्यासमई कुईन (क्वीन) राणीहि परगावास गेली. आसा मजकूर जाहाला.
त्यात बहुत बोलतात. वजिरास कारभारातून काढतील. परंतु खास आज काही लेहवत नाही. या मुलखाचे लोक जबरदस्त आहेत. पातशानी गैरकाम केले, बेदाद जाहाल्यास, तात्काळ राज्यावरून काढितात. आणि हाली काढले. फ्रेच्य येथील लोकानी लोहीस फिलप पातशाहा काढलेले ते लंडनास पलून येऊन राहिले आहे. दुसरे प्रश्याहि (प्रशियाहि) सदरह प्रमाणेच आले. बाकी जागोजागीचे पातशाहा लोक रयतेस भेऊन, रयत लोकांचे म्हणण्याप्रमाणे कबूल करून आहेत. आसे तंटे, त्यात हाली येथे वजिरानीहि रयतेवर जोर ठेवण्याबद्दल नवा कायदा करण्याचा क्रम केला, त्याजवरून स्काटलंड व आयेरलंडचे लोक लडण्यास मर्ण्यास तयार जाल आहेत. याप्रमाणे वार्ता आहेत. परंतु अखेरीस काय होईल से पाहावे. सदरहू मजकूर नुजपेपरात छापले आहेत.
आंग्रेजी बनिया कंपनीच्या माशाने गिळलेले मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्याचे माणिक त्याच्या घशातून खेचून काढण्यासाठी रंगो बापूजी विलायतेत काही सज्जन इंग्रेज मुत्सद्यांच्या सहायाने अक्षरशः रात्रंदिवस झगडत असतानाच, काशीच्या शिलकी छावणीचे वाटोळे करण्याच्या सातारी भटांच्या कारवायाना ऊत आला होता.
बाळाजीपंत नातूने रयतेला छळून लाखो रुपये गिळंकृत करण्याचा सारखा तडाखा चालविला होताच. पण स्वारीने अखेर सरकारी तिजोरीवरहि धाड घालून आपले नि आपल्या नातेवाईकांची घरे भरायला कमी केले नाही. अखेर आप्पासाहेबाने स्वारीला मुद्देमालासह पकडून, दिवाणगिरीवरून बडतर्फ केले आणि हदपारहि केले. अर्थात स्वारी आता पुण्याला मोकळी बसलेली. तेव्हा पुन्हा सगळे जुने खेळ नव्या उमेदीने खेळण्यासाठी भट कार्यकत्यांची सेना त्याने जमविली. रंगो बापूजीला याचा वास येताच, लगेच काशीला त्याने इषारा दिला की.-
`ब्राम्हण लोकास जोर नाहीसा जाहाला म्हणजे ग्रामण्य उभे करावे आगर दगा करावा ह्या युक्ती. याजकरिता सावधगिरी ठेवावी. ब्राम्हण दगा करण्यास चूक करणार नाहीत.’’ हो, आणि बाळाजीपंत नातू असल्यावर चूक होईल तरी कशी? त्याने चिटणीस, पुतळाजी सावंत आणि बाळाबाई मोहिते या तिघांनी महाराज छत्रपतीची खासगी दौलत काशीला चोरून लांबविली अशा माहितीचे अर्ज मुंबई सरकारात पाठवून दिले. तेथून ते कलकत्वाची हवा खाऊन, लगबगीने विलायतेला रवाना झाले. हेतू इतकाच कीं प्रतापसिंहाचे मागे सातारच्या गादीवर शाहाजीराजे यांचा हक्क ठरविण्याचा रंगो बापूजीचा लंडनमध्ये चाललेला उद्योग डागळावा, तेथल्या कंपनी अधिकान्यांच्या हातांत विरोधाचे हत्यार लाभावे आणि काशीच्या छावणीतले सगळे बखेडखोर तेथल्या गंगेतच खलास व्हावे. नातूचे प्रतापसिंहाशी काही वैर असले, तरी ते त्याच्या मरणांतीहि न विसरण्याइतकी त्याची खुनशीमनोवृत्ति राक्षस योनीतहि आढळणार नाही.
प्रतापसिंहाच्या राणीने यशवंत मल्हार चिटणीसाला शहाजी बाल छत्रपतीचे दिवाण म्हणून नेमणूक दिली. ही बातमी रंगो बापूजीला समजताच तो ७ एप्रिल १८४८ च्या पत्रात लिहितो.-
"तूर्तच जलदी करावयाची नहुती. ईश्वरे चाकरी शेवटास नेहून नंतर आज्ञा होती तर फार चांगले होते. कारण लहानपणा इतके कोणतेच सूख नाही. मोठ्या दरज्यास घातल्यास हासे ईश्वरानी करू नये हीच फिकीर रात्रंदिवस आहे. दूसरे, राजेश्री यशवंतराव राजे शिर्के व भगवंतराव विठ्ठल यासह काही दरज्या दिल्याचे लिहिलेले नाही. परंतु ते व मी समदुक्खी आहो. त्या उभयतास काही दरज्या द्याव्या. लिहून यावे. खरे पाहिले तर नवी कमी केलेली मासिक नेमणूक धिक्कारण्याचा राणीने सत्याग्रह केल्यामुळे, काशीच्या छावणीत सगळ्याच बाजूनी हालांची परमावधि चालू होती. राणीने आंगावरचे दागिने विकून तेथला संसार चालविला होता. हणमंतराव पवार, चिंतोपंत भाटे आणि नाराजी नाईक यानी गोजराबाईला चिथाऊन वेगळी केली, त्याच वेळेला तिने आपला दागदागिना आईजवळून यादवार मागून नेला होता. रंगो बापूजीला लंडनमध्ये पैशाशिवाय पाऊल टाकता येई ना. पण "मी भीक मागून राहीन, तुमचे तुम्ही तिकडे नीट भागवून घ्या."
असे त्याने स्पष्टच कळविले होते. अशा चक्क भिक्षांदेहीच्या अवस्थेत यशवंतरावाला चिटणिसाचा दिवाण केले काय नि न केले काय, त्यात राणीच्या समाधानापेक्षा विशेष काही अर्थ नव्हताच. पण त्या अर्थावरहि अनर्थ रचायला सातारी कटबाज कान टौकारून तयार होते. छत्रपतीच्या छत्राचा ति तक्ताचा नव्हता ठावठिकाणा पण दिवाणगिरीची जागा ब्राम्हणाची, ती चिटणिसाच्या जातीकडे गेली, म्हणून सातारा पुण्याच्या बामणांनी केला एकच ठणाणा नाटकातसुद्धा बामणेतराचे नि विशेषतः कायस्थ प्रभूचे वर्चस्व सहन न होणाऱ्या त्या पुणेरी सातारी भटांच्या आतड्यांची रचना कशी काय असेल कोण जाणे!
गोविंदराव विठ्ठल महाजनी ऊर्फ गोविंदराव दिवाण नगरच्या तुरुंगाचे नातूप्रासादिक षोडशोपचार भोगून सन १८३९ साली मोकळे झाले होते. काही दिवस सातारा, नंतर पुणे आणि नंतर आळंदी येथे श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या पावन क्षेत्रात हरि हरि करीत बसले होते. नातूची छावणी पुण्याला पडल्यावर तिची सावली आळंदीला भोवली नसती तरच ते आश्चर्य झाले असते. महाशय नातूने गोविंदराव दिवाण्याची (हो! आता ते दिवाण थोडेच होते? आणि पूर्वी तरी कधी होते? बाप होता दिवाण म्हणून लोक याना हाका मारीत दिवाण, इतकेच. आता मात्र तो खराखुरा दिवाणच होता.) त्या दिवाण्याची भेट घेऊन, झाले गेले विसरण्याचा आग्रह केला नि पुन्हा राजकारण खेळून ‘देशसेवा’ करण्याला प्रोत्साहन दिले. याचा जोडीदार बळवंतराव चिटणीस पुण्यास ठाणबंदीच्या अनंत हालअपेष्ठा पत्करून सन १८४३ साली देवलोकी गेला. पण त्याने नातूचा कसलाहि उपदेश जुमानला नाही. त्याचा कठोर शब्दांत धिक्कारच केला.
गोविंदरावचा तर चिटणिसापेक्षाहि अधिक छळ झालेला होता. पण नातू भेटताच तो बनला त्याचा शागीर्द नि लागला हवे ते खेळ खेळायला. गोजराबाईला फितऊन वेगळी काढण्यात आणि राणीच्या बापाला (खानविलकराला) नागपुराहून बोलावून काशीला पाठविण्यात या गोविंदरावनेच खटपटींचे धागेदोरे हालविले होते. `तुमच्या मुलीच्या आजूबाजूला आता कोणी शहाणा मुत्सद्दी नाही. आहेत ते सारे पोरसवदा नि पोटभरू. महाराजांच्या मागे तिची काही चांगली सोय लावायची, तर इंग्रेज सरकारशी भांडून हाती काय लागणार? तेव्हा तुम्ही काशीला तिच्याजवळ रहावे आणि आमच्या नि बाळाजीपंतांच्या सल्ल्याने तिच्या कल्याणाचा मार्ग साधावा’ अशा गोड उपदेशाने भारून त्या म्हातार्याला काशीला पाठवून दिला. रंगोबाला हे समजताच, हा सारा आपल्या विलायतेतल्या चळवळीला बांध घालण्याचा कट आहे, हे ओळखून, त्याने चिटणीसाला काशीला लिहिले की.- "गोविंदराव यास लिहावे की तुम्ही कोणी उतावली करून कामाचा बिघाड करू म्हणाल तरी तुमचे हाती नाही. परंतु तुमचे कर्णीची परीक्षा जनास दिसून येईल."
संपत्तीने नातू नवकोट नारायण असला तरी समाजात त्याचे नाव सगळीकडे कानफाट्या पडलेले होते. इंग्रेजी अधिकाऱ्यांच्या सावलीत तो वावरत असल्यामुळेच, लोक त्याला भिऊन वागत, एवढेच. म्हणून नागपूरच्या खानवीलकराला उठविण्यासाठी, नातूने गोविंदराव दिवाणाचे साळसूद प्यादे पुढे ढकलेले होते. शिवाय, नातूच्या किंवा गोविंदरावाच्या या नव्या उचापती स्वयंप्रेरीत नव्हत्याच. रंगो बापूजीच्या इंग्लंडमधील धुमाकुळी चळवळीने बनिया कंपनीचे तेथले नि हिंदुस्थानातले अधिकारी आता अगदी उठवणीला आले होते. सातारा प्रकरणाने त्यांच्या कायदेबाजीचे न्यायाच्या फुशारकीचे आणि माणुसकीच्या जाणिवेचे दररोज तेथल्या वृत्तपत्रांतून, नाक्यानाक्यावरच्या सभांतून, हस्तपत्रिकांतून रंगो बापूजी नि त्याचे वजनदार इंग्रेज दोस्त अखंड वाभाडे काढीत होते. डायरेक्टर नि प्रोप्रायटर कोर्टाची एकहि सभा या भानगडीच्या तुफानी वादविवादाशिवाय सुनी जाई ना. म्हणून काशीचें मूळच कायम छाटून टाकण्यासाठी मुंबई कलकत्ता नि लंडनचे कारभारी नातूमार्फत नवा डाव खेळत होते.
आप्पासाहेबाचा मृत्यू
"सातारियात श्रीमंत राजश्री आपासाहेबाची प्रकृत फार बिघडली आहे. जी वेल जाती ती त्याची ऐश्याची (आयुष्याची) घडी सरत आहे. हे वर्तमान मुंबईहून आले व येथे नूजपेपरातहि छापिले आहे." असे रंगोबा ता. ६-५-१८४८ च्या पत्रात काशीला लिहितो. यापूर्वीच ५ एप्रिल १८४८ बुधवारी दुपारी दीड वाजता आप्पासाहेब मरण पावला होता. मरणापूर्वी थोडे तास त्यानी डॉ. जे. मरे याच्या समक्ष अंबूजी भोसले शेडगावकर याचा मुलगा व्यंकटराव याला दत्तक घेण्याचा विधि घाईघाईने उरकून घेतला. त्यावेळचा रसिदंट बार्टल फियर बाहेरगावी होता. रसिदंट संध्याकाळी येईतोवर दत्तकाचा प्रश्न थोपवून धरण्याची डॉ. मरे याने खूप खटपट केली. पण मी संध्याकाळपर्यंत वाचत नाही असे आप्पासाहेबाने सांगितल्यावरून त्याचा नाइलाज झाला. [परिशिष्ट पहा.]
आप्पासाहेबाच्या मृत्यूची बातमी मुंबई कलकत्त्याला पोहोचताच लॉर्ड डलहौशीने तातडीची डाक पाठवून, सातारचे राज्य खालसा केल्याचे जाहीरनामे फडकावले. आप्पासाहेबाचा दत्तक सरकारने मान्य करून गादीवरील त्याच्या वाजवी हक्काना सरकारने मान्यता द्यावी, असा बार्टल क्रियरने प्रयत्न केला, पण कलकत्याच्या बलाटाच्या हुकुमापुढे तो बिचारा रसिदंट काय करणार? शिवाय, लंडनच्या कंट्रोलबोर्डाच्या चेअरमनची खास आगामी सूचना डलहौशीच्या हातात होतीच. तो फक्त आप्पासाहेबाच्या मृत्यूची वाट पहात होता.
सातारचे राज्य खालसा केल्याचे समजताच, काशीहून शाहूराजाने, त्यावर आपला हक्क आहे. सन १८१९ च्या तहनाम्याप्रमाणे तुम्हाला माझे हक्क डावलता येणार नाहीत, वगैरे विधानांचा अर्ज ग. ज. कडे आणि लंडनला रंगोबाकडे रवाना केला. पण या मंडळींच्या कसल्याहि चिठोऱ्याची दादच घ्यायची नाही, हेच जेथे मुळी धोरण, तेथे हा उपदव्याप अरण्यरुदनासारखाच झाल्यास आश्चर्य कशाचे?
काशीकरांची उपासमार
नेमणूक कमी केल्याबद्दल राणीने नि बालछत्रपति शाहूने ता. ७-१२-१८४९ रोजी आपले तक्रार अर्ज ग. ज. कडे रवाना करण्यासाठी एजंट मॅक ग्रेगरला दिले असता, त्याने घेतले नाहीत. ‘महाराजांच्या हयातीत खूप पैका दडवून ठेवलात, आता कशाला हवा तुम्हाला आणखी?’ असा कुच्छित नि उर्मट टोमणा त्याने राणीला दिला. ती चिडली. "घ्या आमच्या घरादाराची झडती. ही आम्ही सगळी मंडळी एका वस्त्राने बाहेर उभी रहातो. पहा कुठे काय दडवून ठेवले आहे ते." असे तिने म्हणताच, मगरूर मगरीगर म्हणतो. "झडति घ्यायचा मला हुकूम नाही", अखेर ती पत्रे डलहौशीकडे परस्परा पाठविण्यात आली. अर्थात ती गेली कचऱ्याच्या टोपलीत. रंगो बापूजीकडे त्या पत्रांच्या नकला जाताच त्याने तात्काळ कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे आणि स्थानिक वृत्तपत्रांकडे त्या रवाना केल्या. कंपनीकडे नकला पाठविताना. रंगो बापूजी आपल्या ७-२-१८५० च्या पत्रात म्हणतो.- ‘‘दिवंगत महाराजानी पैका ‘दाबून ठेवला’, या तुमच्या हिंदवी अधिकाऱ्यांच्या संशयाची निवृत्ति हव्या त्या रीतीने करून घेण्याचे राणीचे आव्हान ते का स्वीकारीत नाहीत? अर्थात खरी वस्तुस्थिति त्याना नि तुम्हाला पुरी माहीत आहे. मेहरबान, आमच्या निरपराध राजाला तुम्ही भिकारी करून कैदी म्हणून ठार मारला आहात. आता त्याच्या विधवा राणीला, पुत्राला नि परिवाराला उपासमारीने बेजार करून माणुसकीच्या नि तुम्हा इंग्रज लोकांच्या नावाला काळीमा फासण्याचे बदकर्म तरी करू नका, दिवंगत राजाने स्वप्नातहि तुमचे वैर कधि केले नाही. पण तुम्ही मात्र मरेतोंवर त्याचा अमानुष छळ केलात. आता तुमचे हे वैर सबंध हिंदुस्थानाला तुमचे वैरी बनवीत आहे, हे लक्षात ठेवा."
नेहमीच्या आंग्लाई बनिया रिवाजाप्रमाणे या पत्राचे उत्तर आले नाही, तरी लंडन कलकत्ता मुंबई मध्ये जोराची डाकाडाकी चालू झाली. जोसेफ ह्यूम, सुलिवान, थॉमसन प्रभृति मंडळीनी कोर्टात नि पार्लमेण्टात या उपासमारीची चर्चा करण्याच्या नोटिसा दिल्या. अर्ज पाठविले, पण नियमाप्रमाणे एकाहि सभेला ४० मेम्बर जमेनात. साताऱ्याचे राज्यच खालसा केल्यामुळे, रंगोबाच्या खटपटीना प्राणांतिक झगड्याचे रूप आले. ता. १७ जून १८५० रोजी त्याने पुन्हा कंपनीकडे अर्ज पाठवून, ‘काशीच्या मंडळींचे अन्नवस्त्रशिवाय फार हाल चालले आहेत, मरणाशिवाय इभ्रतीच्या जिण्याची सुटका नाही. तेव्हा कोर्टाने त्यांची मासिक दहा हजाराच्या नेमणुकीची तातडीने तजवीज करावी,` अशी विनंती केली. उत्तर किंवा खुलासा द्यायचाच नाही, हे ठरलेलेच होते.
यापूर्वी, ‘सातारचे राज्य महाराष्ट्राच्या राजकारणी जीवनाचा आत्मा आहे, ते खालसा करून ‘मराठ्यांच्या भावना दुखवू नका` अशा अर्थाचे हजारो लोकांच्या सह्यांचे अर्ज तयार करून लंडनला पाठवून देण्याविषयी, रंगोबाने खंडेराव बळवंत चिटणीसाला आग्रहाचे पत्र लिहिले होते. दोन तीन मसुदेहि पाठविले. "येथे मी सत्तर हजारापर्यंत सह्या करून घेऊन पारलमेंटात अर्ध्या गुजरल्या. ही चाल हिंदुस्थानात माहीत नाही. परंतु हाली आपण सुरू करावी... मुंबई गवरमेट म्हणतात, कंपनीचा आमल सातारचे मुलखात जाहल्यास ती हिंदू रयेत सर्वत्र मोठी खुषी आहेत, याजकरिता हा क्रम जरूर केला पाहिजे... श्री जगदंबेचे आणि सीवाजी छत्रपतीचे नाव घेऊन क्रम चालवावा येथील क्रमावरून पिशाच्येवत दोस्त लोकांचे आर्जव करीत फिरतो. वेल नाही. खाणे वगैरे ईश्वराचे नावे येक वेल खातो. येखादे वेली फुरसद न पडली तरी तसाच जातो. जीवात जीव आहेतो यत्न करावा, त्यात ईश्वर मदत करील हा भरवसा आहे." पण पुढील घडामोड़ी इतक्या झपाटयाने होत गेल्या की हा सार्वजनीक सह्यांच्या अर्जांचा प्रश्न रंगारूपाला आल्याचे दिसत नाही.
रंगो बापूजी इतकेच करून स्वस्थ बसला नाही. प्रतापसिंहाबद्दल नि त्याच्या राजघराण्याबद्दल रक्ताचा किंवा स्नेहभावाचा जिल्हा वरचेवर दर्शविणाऱ्या उदेपूर, तंजावर, नेपाळ आदीकरून पाचपन्नास राजे महाराजांकडे त्याने काशीच्या मंडळींच्या सांपत्तिक सहायासाठी तात्काळ मदत पाठविण्याच्या प्रार्थनेचे अर्ज लंडनहून स्वता रवाना केले आणि यशवंतराव चिटणीसालाहि नकला पाठवून, आणखी येथल्या मोठमोठ्या इनामदार दरकदाराना तसले अर्ज परस्परा पाठविण्याची विनंती केली. हा विलायती रिवाजाचा प्रकार यशवंतरावला नीट पटविण्यासाठी लांबलचक खुलाशाचे पत्रहि त्याने लिहीले. या विनंतीअर्जाचा काही उपयोग झाला नाही, तरी त्याच्या नकला इकडे ग. ज. मार्फत येऊन दाखल झाल्या तरीहि त्यांचा मला इकडे जाहीर पुकारा करून, चळवळीचा जोर वाढवून, पार्लमेण्टावर इंग्रज रयतेचा दबाव आणता येईल, अशीहि सूचना त्याने केली होती.
कंपनीने आप्पासाहेबाचा दत्तक अमान्य करून तडकाफडकी राज्यच खालसा केले, तेव्हा काशीची राणी, राजपुत्र आणि परिवार यांची वाट हे गोरे बनिये कशी काय लावणार, हा मोठा तीव्र विवंचनेचा प्रश्न उत्पन्न झाला. अखेर `बालछत्रपति शाहूला लंडनला आणवून, त्याच्या प्रदर्शनाने इंग्रजी रयतेला चिथावण्याला आम्ही कमी करणार नाही’, येथवर रंगोबाच्या इंग्रजी दोस्तांच्या धमक्यांची मजल गेली. रंगोबाच्या वैयक्तिक हालांना तर सीमाच उरली नव्हती. सकाळपासून मध्यरात्रीपर्यन्त त्याच्या पायावर भोवरा गरगरत होता. सख्या नावाचा एक नोकर बरोबर होता. त्याला गेले वर्ष मलेरियाने हैराण केले होते. थंडीची हुडहुडी आली का तो मोठमोठ्याने रडून धाय मोकलायचा. "सख्याची प्रकृत फार बिघडली. त्यायोगे हवालदिल जाहला आहे. ईश्वर निभावील तो सुदीन. भांडी हातानी उजळणे वगैरे मलाच कर्णे प्राप्त, तशात बाहेर जाण्याची संधि सांभालने वगैरे अडचणी काय लिहू? ईश्वरास माहीत आहे." दुसरे दोन गडी पाठविण्याविषयी रंगोबा वरचेवर काशीला लिहीत असे. पण तिकडे सगळाच बोजवारा एकदम उडाल्यामुळे, त्या विनंतीचा विचार करणार कोण नि कसा?
प्रकरण २८ वे
ग्रंथ आटोपला तरी प्रवचन चालूच!
आप्पासाहेबाचा मृत्यू होताच, सातार्याचे राज्य एकदम खालसा केल्याने, महाराष्ट्रात नि हिंदुस्थानात गुप्त संतापाची नि आंग्ल द्वेषाची जशी एक प्रचंड लाट उसळली, तशी ती इंग्लंडातील चार्लस फोर्ब्स, सुलिवन, ह्यूम, थॉमसन प्रभृति अनेक सज्जन इंग्रेजात आणि आंग्ल जनतेतहि ती खळबळाटाचे तुफानी धडके देऊ लागली. दोस्त हिंदी राजाला पदच्युत नि हद्दपार करण्याचा इंग्लंडच्या कोणत्याहि कायद्याने कोणाला अधिकार नसता, जेम्स कारन्याक गवनराने प्रतापसिंहाला पदच्युत नि हद्दपार करण्यात धडधडीत बेकायदेशीर कर्म केले आणि आता तर ग. ज. लॉर्ड डलहौशी १८१९ च्या तहनाम्याला चक्क पायदळी तुडवून, आप्पासाहेबाचा दत्तक न जुमानता, खुशाल बेदरकारपणाने सातारचे राज्यच खालसा करतो, ही अंदाधुंदी आहे तरी काय, याचा जाब कंपनीची कोर्ट आणि पार्लमेण्ट यांना विचारण्यासाठी चार्लस फोर्स जे. सुलिवन, एम. लेवीन, थॉमस फॉक्स, जॉन पॉइण्डर, ग्रेहाम, जोसेफ ह्यूम प्रभृति रंगोबाच्या एकनिष्ठ आंग्ल दोस्तानी नोटिसांवर नोटिसा देऊन, अनेक कायदेशीर प्रश्नांच्या भडिमाराने कंपनीची कोर्टे नि हाऊस ऑफ कॉमन्स याना त्राही भगवान करून सोडले.
सन १८१९ च्या तहनाम्यातील "त्या मुलकाचे राज्य माहाराज छत्रपति व त्यांचे फरजंद व वारीस व कायम मुकाम (टु सीड इन परपीच्युअल सॉवरिनिटी टु द राजा ऑफ सातारा, हिज एअर्स अॅण्ड सक्सेसर्स)’’ या शब्दांचा अर्थ शोधण्यासाठी वकिली टाळक्यांचा कीस पाडण्यापेक्षा, तो तहनामा ज्या एलफिन्स्टनने नि ग्रांटडफने लिहिला, ते हयात आहेत, त्यांनाच बोलाऊन का विचारीत नाही? अशीहि आव्हाने अनेक वेळा दिली. शिवाय, तमाम इंग्लंडच्या कौण्टी कौण्टीतून जाहीर व्याख्याने थॉमसन नि रंगो बापूजीनी देऊन लोकमताला कौल लाऊन, त्याचा दबाव कंपनीवर आणि पार्लमेण्टवर आणण्याचा खूपच अट्टहास केला. थॉमसन आणि रंगो बापूजीची हीं व्याख्याने इतक्या भयंकर ज्वलज्जहाल भाषेची असत, की त्या दोघांवर सरकार फिर्याद का ठोकीत नाही. याचेच ज्याला त्याला आश्चर्य वाटायचे. कंपनीचे डायरेक्टर नि प्रोप्रायटर लोक खोटे बोलणारे, खोट्या साक्षी देणारे, खोटे दस्तऐवज बनावणारे, विश्वासघात करणारे, तहनाम्याची वचने तुडविणारे, हिंदी रयतेला लुटणारे पाषाणहृदयी दरोडेखोर आहेत, अशा शेकडो जाहीर आरोपांची सरबत्ति कंपनीचे कारभारी मुकाट्याने ऐकून स्वस्थ बसत आहेत, तेव्हा पाणी कोठे मुरते आहे, याची इंग्रजी जनतेला स्पष्ट कल्पना झालेलीच होती.
थॉमसन नि रंगो बापूजीची ज्वलज्जहाल जाहीर व्याख्याने, त्यांची पत्रके आणि खुलासे छापून प्रसिद्ध करणाऱ्या आणि त्यांवर तितक्याच जहालपणाने संपादकीय लेख लिहिणाऱ्या लंडनच्या पत्रकारांवरहि कंपनी सरकारला खटले भरून जाब विचारण्याची छाती झाली नाही. खरे पाहिले तर कंपनीचे डायरेक्टर नि प्रोप्रायटर लोक या वेळी इतके बेशरम बनले होते की त्यानी अब्रू बेअब्रूची सारी चाड गुंडाळून ठेविली होती. हिंदुस्थानच्या लोकांना नि राजेरजवाड्याना लुबाडून आपले खिसे कसे गडगंज भरता येतील, एवढेच ते पहात होते. अर्थात ‘मौनं सर्वार्थ साधनं’ त्याना सोयीस्करच होते. दररोज ठिकठिकाणी नि वृत्तपत्रांतून अखंड सुरू असलेली बदनामी साफ करून घेण्याच्या फंदात ते पडते, तर पहिल्या धडाक्याला ते आपल्या अधिकारांच्या उच्चासनांवरून दूर झुगारले गेले असते आणि कर्नल ओवान्स, जेम्स कारन्याक गवर्नरासारखे लोक तर इंग्लंडच्या न्यायासनाने तुरुंगात खडी फोडायलाच रवाना केले असते.
कायदेबाजीच्या प्रश्नाशिवाय कंपनीच्या हिंदवी कारभार्यानी प्रतापसिंहाच्या राणीची नेमणूक कमी करून, ती धिक्कारण्याचा सत्याग्रह करायला तिला भाग पाडून, तिची सपरिवार उपासमार चालविली आहे. सातारच्या कटबाजानी तिच्या सावकारांना चिथावून तिच्या दरवाज्यावर धरणी धरायला लावले आहे, असल्या हकिकतीनी रंगो बापूजी तर ठिकठिकाणचे लोकमत रोजच्या रोज अधिकाधिक भडकावीत होता. "जबरदस्तीने का होई ना, पण माझ्या राजाला दरमहा अवघे दहाच हजार रुपये नेमणूक देऊन, त्याला तुमच्या लोकांनी ठार मारला. मी म्हणतो तुमच्या लोकांनी त्याचा खून केला. आता त्याच्या राणीला नि वारस बालछत्रपतीला एक दमडीहि न देता, त्यांचा उपासमारीने तेजोभंग ते करीत आहेत. अर्धकोटी रुपये उत्पन्नांचे आमचे सातारचे हिंदू राज्य या गिधाडी कंपनीने आपल्या घशात टाकले. दहा हजाराची मासिक नेमणूक सातारच्याच खजिन्यातून येत होती. ती काही तुमच्या इंग्लंडच्या खजिन्यातून देत नव्हता तुम्ही, ती कमी करण्याचा अगर बंद करण्याचा हक्कच काय तुमच्या लोकांना?" असले कठोर वाक्प्रहार तो बेगुमान करायचा. हा प्रचार सन १८५२ पर्यंत अखंड चालू होता. या तीन वर्षांत सुलिवन, ह्यूम, थॉमसन प्रभृति दोस्तानी प्रयत्नांचे पर्वत पालथे घातले. पण इकडे काशीला भलत्याच घटना घडत होत्या.
साताऱ्याच्या सैतानाची काशीयात्रा
इंग्लंडच्या रंगोबाच्या चळवळीला लंडनच्या डेली न्यूज, टाईम्स, ईवनिंग सन वगैरे सार्वजनिक आणि ब्रिटिश फ्रेण्ड ऑफ इंडिया वगैरे प्रतापसिंहाच्या आश्रयाने चाललेल्या वृत्तपत्रानी कमालीचा पाठिंबा दिल्यामुळे आणि त्यांचे पडसाद मुंबई-कलकत्याच्या देशी पत्रांत वरचेवर उमटल्यामुळे लंडन नि हिंदुस्थानातल्या गवर्नर नि गवर्नर जनरलादि अधिकाऱ्यांची खूपच तिरपीट उडू लागली. दर घोटाला ठसक्या शिवाय व्हिस्की त्यांच्या घशाखाली उत्तरे ना. पण अर्कट आंग्रेज म्हणजे डोंगळ्या इंगळ्याची जात! मान तोडली तरी चावा सोडायची नाही. कमी केलेली नेमणूक न घेण्याचा राणीचा सत्याग्रह तिच्याच अंगावर उलटविण्याच्या आणि सगळ्या बाजूनी नाडून तिला शरणागत यायला भाग पाडण्याच्या त्यांच्या कारवाया जोरात चालूच होत्या. सातारच्या बाळाजीपंत नातूसैतानाला हाताशी धरून राणीच्या खानवीलकर बापाला आधीच काशीला आणून ठेवला होताच. जवळचे दागदागिने लिलावाने विकून, त्या पैशावर राणीने एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल तीन वर्षे टिकाव धरला. परिवाराला दिवसाचे एक वेळ भरपूर जेवण घालून, स्वतः राणी, राजपुत्र, चिटणीस, पोतनीसादि निकटवर्ती मंडळी गुपचूप चणेकुरमुरे फाकून दिवस कंठीत होते. कर्ज काढण्याची सोय नव्हती. उलट, सगळे सावकार मागल्या देण्यासाठी, वाड्यावर धरणेच धरून बसले होते. अशा अवस्थेत ती स्वाभिमानी राणी किती दिवस काढणार? सारेच प्रकरण कडेलोटाला यायच्या सुमारासच बाळाजीपंत नातूची स्वारी काशीला येऊन दाखल झाली आणि राणीसरकार माझ्यावर विश्वास ठेवतील तर इमाने इतबारे आंग्रेजांशी अनुकूल बंदोबस्त करविण्याची खटपट करून, ही कोंडी फोडतो. असा त्याने तोंडी निरोप पाठवला.
राणीने आपल्या हितचिंतकांचा दरबार भरवला. उलटसुलट खूप चर्चा झाली. ग. ज. कडे अर्ज विनविण्यांची परवड रचली तरी येथे आणि विलायतेलाहि कोठे काही आमची दाद लागत नाही. यापुढे दिवस निभणे कठीण. तेव्हा नातू सांगतात तर त्यांच्या मध्यस्थीने काय होईल ते ठरवून घ्यावे, असा राणीने आपला अभिप्राय दिला. आमच्या स्वराज्याचा नि सर्वस्वाचा घात करणार्या नातूवर विश्वास ठेवणे कितपत हितकारी होईल, याची यशवंतराव चिटणिसाने स्पष्ट शंका पुढे मांडली. जी काही खटपट करायची ती सरकारने नेमलेल्या एजंटामार्फत करावी, नातूच्या मार्फतीने करण्यात धोका आहे, असेहि त्याने बजावले, पण राणी म्हणाली.- "मला ते सारे समजते. पण गेले ३० महिने पैशाशिवाय कसेबसे निघाले, पण यापुढे एक दिवसहि निभावणार नाही. ही वादविवादाची वेळ नाही. अडचणीतून मार्ग काढण्याची तजवीज केली पाहिजे, नातू सांगतील तसेच मी करणार." राणीच्या अभिप्रायाला म्हातार्या खानवीलकराने जोराचा पाठिंबा दिला. "कुंफनीची (कंपनीची) सदी हाइ लइ जोरावर, मोटंमोटं गायकवाड नि शिंदे नि व्हलकर नि आमचं नागपूरकर भोसल बि तेंच्या जोरापुढे बसल्याति गूपचाप, सातारचं राजबि कुंफनी सरकारनं बरखास्त केलाया. नि मंग हतं काय हवा खाऊन न्हायचं नि आखीर मरायचं व्हय? बच्चा गवेण्डराशी बातचीत करूनश्यान नातू काय बंदुकबस्त करत्याल, त्यो पत्करावा, हेच्यातच श्यानपन हाइ. लइ तानल, लइ तानलं, बस्स जालं."
रंगो बापूजीला ही बातमी यशवंतराव चिटणिसाने ता. १३ जून १८५० च्या पत्राने कळविताच त्याने ७ नवंबर १८५० च्या लंडनच्या सन पत्रात त्याचा सर्व खुलासा जाहीर केला. "अखेर राणीचा सर्वतोपरी कोंडमारा करून, आमच्या देशी परदेशी वैऱ्यानी संधी साधली! सातारच्या राज्यावरचा आमचा सर्व हक्क आम्ही सोडीत आहोत, या पुढे राजेपणाचे कसलेहि चिन्ह अथवा मायना आम्ही वापरणार नाही, असे राणी नि राजपुत्राकडून त्या नातू भटाने आपल्या मर्जीप्रमाणे लिहून घेऊन, तो दस्त ग. ज. कडे रवाना केल्याचे वृत्त या डाकेने हाती आले आहे." या याददस्ताची तारीख २४ जून १८५० असून, त्या वेळचा एजंट मेजर स्ट्यूअर्ट याने बनारसहून ता. १७ जुलै १८५० रोजी तो ग. ज. लॉर्ड डलहौशी याजकडे पाठवून दिला. सोबतच्या पत्रात त्याने लांबलचक खुलासा करून राजाला सत्तर हजार रुपये कर्ज असल्याचे कळविले होते. सपरिवार आम्हाला परत सातार्यास जाण्याची बडेलाटानी कृपेने परवानगी द्यावी, या राणीच्या विनवणीचा अनुकूल विचार व्हावा, अशीहि त्याने शिफारस केली.
शरणागत शत्रूला वाईट रीतीने वागवू नये, हे हिंदुधर्माचे तत्व त्या पाषाणहृदयी क्रिस्ती डलहौशीला कसे माहीत असणार? त्याने ७ आगस्ट १८५० च्या आपल्या लंब्या अभिप्रायात (मिनिटात) म्हटले आहे की त्या मयत राजाची विधया आता सरकारला सपशेल शरण आली आहे. तिकडे लंडनात त्या रंगो बापूजीने चालविलेली चळवळ, त्याला माघारा बोलावून बंद पाडण्याचे तिने आश्वासन दिले आहे. कारण, आपल्या दत्तक पुत्राच्या नावाने राज्यप्राप्तीच्या खटपटीचा तिने राजीनामाच लिहून दिला आहे. या पुढे खर्चासाठी काय पाहिजे, यांच्या राणीच्या अपेक्षा काहीहि असल्या तरी तिच्या नि परिवाराच्या खर्चासाठी दरमहा ५ हजार रुपये पुरे आहेत, असे एजंटाच्या शिफारशीप्रमाणेच माझे मत आहे. लंडनचा तिचा एजंट रंगोबा याला आता राणीकडून किंवा कोठूनहि एक छदाम नाही. तोहि मग कंटाळून येईल भीक मागत परत. तेव्हा राणीला आणि तिच्या त्या दत्तक पोराला दरसाल ६० हजार रुपयांची नेमणूक मंजूर करण्याची कोर्टाने दया दाखवावी, अशी माझी शिफारस आहे. ग. ज. चे हे म्हणणे राणीला कळविताच तिने साष्टांग प्रणिपातपूर्वक दिलेल्या दानाचा स्वीकार केला आणि काशी क्षेत्रातील दुर्दैवाच्या कहाणीचे हे नाटक येथे थंडावले.
सैतान अखेर साधूच्या वेषात मेला
अखेर अखेर बाळाजीपंत नातूची महाराष्ट्रात इतकी नाचक्की झाली होती, की हमरस्त्याने जाणेहि त्याला कठीण होऊन बसले होते. पुण्याचे अनेक स्पष्टवक्ते ब्राम्हणहि त्याला अलिकडे नमस्कार करीत नसत आणि समोरासमोर गाठ पडलीच तर उघड तिटकारा करायला चुकत नसत. घरचा, दारचा, सोयऱ्याधायर्याचा या बिचार्या बदकर्मयोग्याने तळीराम चांगलाच गार करून ठेवला होता. तेव्हा अखेर मोक्षसाधनासाठी, बाळाजीपंत काशीला गेला नि तेथे त्याने वेदोक्त विधिपूर्वक संन्यासदीक्षा घेतली. संन्याशाची भगवी कफनी घातलेली असतानाच, त्याने प्रतापसिंहाच्या राजसबाई राणीला अंग्रेजाना शरण जाण्याचा मंत्र दिला, राजीनाम्याचा खर्डा स्वता लिहून दिला आणि एजंटामार्फत आपल्या या अखेरच्या कंपनीच्या सेवेची परमावधि केली.
मोठी आश्चर्याची गोष्ट हीच की ज्या २४ जून १८५० रोजी राणीने सातारच्या राज्याच्या बेदाव्याच्या राजीनाम्यावर सही करून, तो एजंटाच्या हवाली केला, नेमक्या त्याच दिवशी संन्याशी बाळाजीपंत नातू काशीला मेला. तो कशाने मेला, हे नीटसे उमगत नाही. पण हृदयक्रिया बंद पडून तो मरणे शक्यच नव्हते. कारण त्या आंग्लभगताला हृदयच मुळी नव्हते, तर त्याची क्रिया बंद पडणार कशी? प्रतापसिंहाच्या राज्याला मायबाप कंपनी सरकारच्या घशात सुखरूप कोंबलेले पाहूनच बिचाऱ्याची प्राणज्योत मावळली. त्याच्या हृदयहीन जीवनाचे सोने झाले, बाळाजीपंत नातू संन्याशी होऊन मेल्यामुळे, सरणावर चढविण्यापूर्वी शंखाने त्याचे मस्तक फोडण्यासाठी, दक्षिणेतून कोणी त्याचे नातेवाईक शंख काशीला धावल्याचा उल्लेख आढळत नसल्यामुळे, त्याविषयी काही लिहिता येत नाही.
`राणीचा हुकूम मी जुमानीत नाही.`
"आम्ही सातारा राज्याचा, तत्संबंधी सर्व अधिकारांचा, पदव्यांचा नि मायन्यांचा बेदावा लिहून दिल्यामुळे, तुम्ही यापुढे आमच्या नावाने लंडनमध्ये कसलीहि सरकार दरबारी खटपट करण्याचे कारण उरलेले नाही. यापुढे तुम्ही आमचे वकील एजेंट किंवा मुखत्यार वगैरे कोणीहि राहिला नाहीत. तुम्ही परत यावे." अशा मजकुराचा नातूने सांगितलेला आणि राणीने लिहिलेला खलिता रंगो बापूजीच्या हातात पडताच त्याने तो दोस्ताना दाखवून, त्यांच्या समक्ष टरटरा फाडून टाकला. "मी राजाचा मुखत्यार वकील, ही राणी कोण मला हुकूम करणार? मी हिचा हुकूम जुमानीत नाही." असे सांगून, प्रतापसिंहाने त्याला मरणापूर्वी नऊ दिवस लिहिलेले ता. ५ आकटोबर १८४७ चे गुप्तपत्र रंगोबाने दोस्तांपुढे ठेवले आणि त्यानी ते लगेच लंडनच्या सर्व वृत्तपत्राकडे प्रसिद्धीला पाठवून दिले.
लगेच त्याने सुलिवनकडून कंपनीला एक अर्ज पाठवून, "राणीला राज्याचा बेदावा लिहून देण्याचा कसलाहि अधिकार नाही. प्रतापसिंहाचे गुप्त पत्र हे त्याचे मृत्युपत्र आहे आणि त्याप्रमाणे बालछत्रपती शाहू यांचा सातारा राज्यावरचा हक्क इंग्रेजाना आंतर्राष्ट्रीय नीतीनेहि डावलता येणार नाही. सातारचा राजा हा काही ब्रिटीश प्रजाजन नव्हता, किवा कोणत्याही शब्दार्थाने ब्रिटीशांचा अंकित नव्हता. तो स्वतंत्र पुरातन राज्याचा धनि होता. त्याचा किंवा त्याच्या औरस वा दत्तक वारसाचा हक्क कंपनीला नाकारता येणार नाही" इत्यादि विधानांची सरबत्ति या ता. ३० आकटोबर १८५० च्या अर्जात झाडण्यात आली.
डलहौशीचा हम करेसो कायदा
राजाला औरस पुत्र नाही, एवढ्याच सबबीवर त्याच्या विधियुक्त दत्तकाला मान्यता न देता, किंवा तहनाम्यातली वारसदारीची आचंद्रार्क अखंडत्वाची हमी न पाळता, देशी राज्ये फटाफट ब्रिटीश राज्याला जोडण्याचा लॉर्ड डलहौशीच्या धोरणाचा खुद त्याच्याच अनेक दरबारी सल्लागारानी स्पष्ट निषेध केला होता. लंडनच्या अनेक वृत्तपत्रांनीहि त्याबाबत मोठे काहूर माजवून, राज्ये गिळकृत करण्याचे कंपनीचे हे धोरण अखेर त्यांच्या हिंदवी अस्तित्वाला धरहाणार नाही, असे कडक भाषेत इशारे दिले होते. हिंदुस्थानातले उरलेसुरले राजे नि नबाब अर्थातच आंग्रेजाच्या वचनांवर नि विश्वासावर आता भरंसा ठेवण्यात अर्थ नाही, हे जाणून चिंताक्रांत झाले. सातारचे राज्य खालसा केल्यामुळे, महाराष्ट्रातल्या लोकांचे आणि प्रतापसिंहाचा द्वेष करणार्या शहाण्यांचेहि डोळे उघडले. रंगो बापूजीने तर लंडनमध्ये अर्जाचा व्याख्यानांचा आणि वृत्तपत्रांत लेखाचा कडाक्याचा धुडगूसच घातला. ७-११-१८५० च्या सन पत्रात तो लिहितो.-
"उपासमारीने वंगलेल्या राणीच्या हातून लिहून घेतलेल्या राज्याच्या बेदाव्याच्या याददस्ताचा कागद तुमच्या त्या महाथोर मार्कविस डलहौशीच्या हातात पडताच त्याला आपल्या `कुनोवर’ मंदिरातल्या शय्येवर अगदी गाढ झोप आली असेल! तुम्हीहि, डायरेक्टर प्रोप्रायटरादि जंटलमनानो, स्वताचे अभिनंदन करून घेणे जरूर आहे. केवढा हा हिंदवी विजयाचा महान् उत्सवाचा प्रसंग. हिंदी लोकांच्या पैशाने तुम्ही तर तो मोठचा थाटामाटाने साजरा केला पाहिजे. लॉर्ड डलहौशीला या महान विजयाबद्दल टोस्ट दिला पाहिजे. तुम्हीहि आपले हात गुलाब पाण्यात बुचकळून घुतले पाहिजेत. आता असे करा महाशय, तो राजीनाम्याचा कागद चांगली झगझगीत फ्रेम घालून, त्यातला मजकूर मोठ्या ठळक अक्षरानी लिहून, येत्या १८५१ सालच्या सर्वराष्ट्रीय उद्योगधंद्याच्या प्रदर्शनात सुधारलेल्या अनेक राष्ट्रातल्या लक्षावधि प्रेक्षकांना दिसेल अशा ठळक जागी मांडून ठेवा, मग ते सारे लोक म्हणतील की ओहोहो, ज्यांच्या राज्यावर सूर्य कधी मावळत नाही. त्या शहाण्या इंग्रेजानी काय मोलाची हो ही ट्रोफी पैदा केली.”
‘तो पोरगा (बॉय) आपण राजा असल्याच्या दिमाखांत मला पत्र लिहितो’, असे तुमचे ते डलहौशी महाशय तुम्हाला लिहितात. खरेच राजाच्या राजपुत्राने स्वताला राजा म्हणणे हे त्यांच्या दृष्टीने अक्षम्य पातकंच नव्हे तर काय! या नंतर रंगो बापूजीने सातारा राज्याची सालिना आपक, कंपनीने गडप केलेल्या प्रतापसिंहाच्या खासगी दौलतीची रकम यांच्या बेरजेतून राणीला देऊ केलेल्या वार्षिक ३० हजाराची रकम वळती घालता, वार्षिक १७ लाख २६ हजार २०० रुपये किंमतीचे राज्य कंपनीने घशात टाकल्याचा हिशोब जाहीर केला. रंगो बापूच्या या लांबलचक पत्रानंतर सनच्या संपादकाने अभिप्राय देताना म्हटले. "हे काय माणूसकीला शोभणारे कृत्य म्हणायचे? हिंदी राजे रजवाडयांना आमच्या आंग्ल हिंदी सरकारबद्दल नि आमच्या शीला विषयी काय वाटेल? ज्या ब्रिटीश राष्ट्राने आजवर प्रामाणीकपणा, दानत आणि प्रत्येक व्यवहारात विवेक दाखवला, असमर्थांना सामर्थ्याचा पाठिंबा दिला, त्या लौकिकाला या सातारा प्रकरणाने काळीमा फासला आहे. अधिकारी मंडळावर काय म्हणणे आहे? उत्तर द्या."
रंगो बापूजी आणि त्याचे दोस्त यानी १८५३ अखेरीपर्यंत अनेक अर्ज देऊन, कंपनीची कोर्ट आणि हाऊस ऑफ कॉमन्स यांच्या पाषाण हृदयाना पाझर फोडण्याचे शिकस्तीचे यत्न केले. त्यांचा छापलेला वृत्तांत विस्तीर्ण नि अवाढव्य आहे. त्याचा नुसता सारांशहि देणे शक्य नाही. मेजर बसूंच्या ‘स्टोरी ऑफ सातारा’ या इंग्रजी ग्रंथात जिज्ञासू वाचकानी तो पहावा.
"रंगो बापूजीला ता. ५ आक्टोबर १८४७ मे पाठविलेले गुप्तपत्र राजाने फक्त मलाच दाखविले होते. तेच त्याचे वास्तविक मृत्युपत्र समजले पाहिजे. त्या पत्राने रंगो बापूजीला शाहूचा प्रतिपालक (गार्डीयन) आणि प्रतापसिंहाचा ट्रस्टी म्हणून राजाने ठरविले." अशी मेजर कारपेण्टरची लेखी जबानी ह्यूम सुलिवान प्रभृती दोस्तानी अधिकाऱ्याना पाठवून, वृत्तपत्रातूनहि जाहीर केली. तरीहि `रंगो बापूजीला आम्ही ओळखत नाही` हे कंपनीच्या अधिकार्याचे तुणतुणे कायमचे चालूच होते.
ब्रम्हावर्ताकडे दृष्टिक्षेप
काशीच्या बंदिवासात छत्रपतीचे चाललेले हाल, त्याचा मृत्यू आणि नंतर त्याची विधवा राणी राजसबाई नि पुत्र शाहू यांचे चाललेले पिंडवडे, नजीकच असलेल्या ब्रम्हावर्तवासी श्रीमंत रावबाजी नि त्यांच्या परिवाराच्या कामावर जात नसतील असे कसे म्हणावे? रंगो बापूजीच्या विलायतेतील चळवळीचे हिंदवी, विशेषतः बंगाल नि मुंबईच्या वृत्तपत्रांतून हरहमेश उमटत असलेले साद पडसाद सेवानिवृत्त पंतप्रधान श्रीमंतांच्या श्रवणपुटांत प्रविष्ट होत असले तरी त्याना काहीहि पर्वा नव्हती. त्यांच्या स्नानसंध्या, ब्राम्हण भोजने, भेटेल त्या पाहुण्याचा नवा विवाह ठोकून त्याचे आदरतिथ्य, कंचन्यांचे नाच, इत्यादि ब्राम्हणपदपातशाही थाट अखंड बिनचूक चाललेला. ते कशाला आपल्या धन्याच्या जगण्या मरण्याची दिक्कत बाळगणार? प्रतापसिंहाच्या मागे त्याची राणी कर्जबाजारी झाली आहे. सावकारानी तिच्या दारात धरणी धरली आहेत.
या बातम्या श्रीमंताना कळत होत्या. सगळ्या हिंदुस्थानाला नि इंग्लंडलाहि त्या वेळच्या वेळी समजत होत्या, तर रावबाजीला उमजत नव्हत्या असे म्हणताच येणार नाही. पण हा ‘श्रीमंत’ असामी त्या बातम्या ऐकून आनंदीत होत असे. त्याने इंग्रेजाना लाखो रुपये कर्ज दिले (आणि अखेर ते त्याच्या वंशजालाहि परत मिळाले नाहीत. सपशेल बुडाले) तरी ‘मरणानांत वैराणी’ या भावनेला अनुसरून, रायबाजीने काशीच्या आपल्या ऋणानुबंधियांकडे तांब्याचा छत्रपतीहि पाठविण्याचे पाप चुकून केले नाही. ऐश्वर्याची चालू वहाती गंगा आता अशीच चंद्र सूर्य जोवरी नभांतरी वंशानुवंश अखंड वहातीच रहाणार, या भरंशावर भरंसाट आयुष्याने जगणारा रावबाजी अखेर १४ जानेवारी १८५१ रोजी मेला.
तो मेल्यानंतर त्याचा वारस दत्तकपुत्र धोंडोपंत नानासाहेब याला मात्र आंग्रेजी करणीचा तमाशा पहाण्याचा प्रसंग आला. या वेळी नानाचे वय २७ वर्षांचे होते, त्याचा इंग्रेज लोकांवर मोठा भरंसा, फार दोस्ती, लई पिरॅम! रोजच्या रोज बिथूर कानपूरचे गोरे हापसर सहकुटुंब सहपरिवार नानाच्या चमचमीत मेजवान्या झोडायला टिपले हजर असायचे. हरण, रानडुकरे, ससे, तितूर इत्यादि अनेक शिकारी पशू पक्ष्यांच्या मांसाचे निरनिराळे पदार्थ तयार करण्यासाठी पटाईत खानसामे नानाच्या पदरी कायमचे ठेवलेले असत. शिवाय फ्रान्सची ब्रांडी, स्कॉटलंडची व्हिस्की, जर्मनीतली बीर आणि इराण मस्कतची गोड मदिरा यांची पार्सले नेहमी मागवून ब्रम्हावर्ताच्या कोठीवर हुकमी तयार असत. मोठमोठ्या गोर्या हपसरांपासून तो एकाया टिपाड टॉमी पर्यन्त जो तो नानासाहेबाची जिकडे तिकडे तोंडभर स्तुतीच करायचा.
("नाना आणि दुसरे विद्रोही पुढारी स्वता उंचीउंची विलायती मये उडवीत होते. संधि सांपडे तेव्हा मद्य आणि डुकराचे मांस भक्षण करीत व मिळतील त्या गौरांगी तरुणीचे उष्टे अधर चोखायला तयार असत. मात्र यावेळी (१८५७) तेच धर्मरक्षणासाठी शिपायांचे नेतृत्व कसं पहात होते.’’ राहुल सांकृतायन कृत "वोल्गा ते गंगा." (पान २७४.))
आंग्रेज आणि मिक्षुक, एका सूत्रगोत्राचे नि पिंडप्रकृतीचे! त्याना ना खायला चाटायला मिळते तोवर यजमानाची ते स्तुति करतात. एकदा का त्यांच्या स्वार्थाला कोठे थोडा चिमटा बसला, का सापासारखे उलटून डांस घ्यायला मागेपुढे ते पहायचे नाहीत.
रावबाजी मेल्यानंतर इंग्रेजानी त्याला तब्बल ३३ वर्षे दिलेले सालिना ८ लाख रुपयांचे पेनशन आपल्यालाहि मिळेल. अशी नानाची प्रामाणिक समजूत. पण देशी राज्ये मटकावायला चटावलेला डलहौशी थोडाच हे पेनशन पुढे चालवणार? त्याने स्पष्ट नानाला कळविले की "ते पेनशन बाजीरावाच्या हयातीपर्यंतचे होते. शिवाय त्याने ते ३३ वर्षे खाल्ले. चांगली २७ लाखांची रोकड त्याने शिल्लक ठेवली आहे. त्यावर तुम्ही भागवून घ्यावे. आमच्याकडून आता एक फद्याहि मिळणार नाही. जे प्रतापसिंहाच्या कपाळी, तेच आले नानाच्या नशिबी! झाले. अर्जवाजी चालू झाली. विधानावर विधानांचे कागदी सुरुंग फुटू लागले. अखेर, नानाने आपला एक विश्वासू मुसलमान, दोस्त अजिमुल्लाखान याला लंडनच्या श्रेष्ठ वरीष्ठ अधिकार्यापुढे न्यायाची मागणी करायला धाडले.
रंकाचा राव, अजिमुल्लाखान
या अजिमुल्लाचे चरित्र मोठे मनोरंजक आहे. हा इंग्रेज लोकांकडे खाना पकवणारा एक खानसामा होता. त्यांच्या संगतीने हा थोडे रेंट कॅट यस नो इंग्रजी बोलत असे. पण पुढे शाळेत जाऊन तो उत्तम इंग्रजी शिकला आणि एका विद्यालयात शिक्षकाचे काम करू लागला. पुढे अंग्रेज हापसरानी त्याला आपले मुनशी नेमले. स्वरूपाने देखणा, वागण्यात रुबाबदार, बोलण्यात चतुर आणि भेटेल त्यावर आपली छाप पाडणारा असल्यामुळे, योगायोगाने तो नानासाहेबाचा बडा इमानी दोस्त और मंत्री बन गया. अजिमुल्ला म्हणेल ती पूर्व, इतका त्याचा नानापाशी बडेजाव वाढला. त्याला फ्रेंच नि जर्मन भाषाहि थोडथोड्या अवगत होत्या. विलायतेहून आंग्रेजी न्याय घेऊन येण्यासाठी हजारो रुपयांचे तोडे त्याच्या कमरेला बांधून, नानासाहेबाने जिल्लाची शुभ मुहुर्ताने लंडनला रवानगी केली.
"या कर्णाटकी चाळ्यानी नाश होईल."
पैशाच्या जोरावर बालिष्टरांच्या फलटणी उभ्या करून, आपण हो हो म्हणता कंपनीच्या अधिकाऱ्यांचा अनुकूल हुकूम मिळवून, डलहौशीच्या निकालाचा निकाल लावू, अशी भोळसट अजिमुल्लाची समजूत. जोवरी न देखिले लंडना तोवरी गरजू करी कल्पना! अजिमुल्लाने काही दिवस लंडनमध्ये गाठीभेटींचे, वगवशिले लावून अधिकार्याना थाटाच्या मेजवान्या देण्याचे सत्र चालविले. पण मुद्यावर येताच जो तो आंग चोरायचा. अखेर एक दिवस त्याने रंगो बापूजीची भेट घेऊन, त्याच्याशी नाना प्रकारची चर्चा केली.
रंगो बापूजी बारा वर्षे डोके फोडीत होता. अजिमुल्ला काल परवा आलेला. त्याने त्याला एकंदर वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. रंगोबा एकसारखा भांडत बसला, शिवाय त्याच्याजवळ पैशाचेहि पाठबळ नव्हते, म्हणून त्याची कोणी दाद घेतली नाही, अशा समजुतीने अजिमुल्लाने पार्लमेंटचे मेंबर डायरेक्टर प्रोप्रायटर यांना व्यक्तिशः नि सामुदायीक थाटाच्या मेजवान्या देऊन, त्यांचा स्नेह संपादन करण्याचा तडाखा चालविला. थॉमसन ह्यूम सुलिवन प्रभृति रंगोबाच्या दोस्तांजवळ मात्र त्याची डाळ शिजली नाही. तेहि डायरेक्टर प्रोप्रायटरच होते. अजिमुल्लाची मोउभोठ्या इंग्रेज घराण्यांत जानपछान झाली. श्रीमंत हिंदी इसम इंग्लंडात गेला का त्याच्यामागे सुखलोलूप आंग्ल तरुणींचा तांडा तेव्हाच लागतो, हा प्रवाद नि अनुभव आजहि ऐकू येतो. अजिमुल्ला स्वरूपाने गोराभरका देखणा नि मिठास बोलणारा असल्यामुळे, त्याच्या पैशावर चैन उडविणार्या अनेक आंग्ल युवतींच्या जाळयात तो गुरफटला गेला.
रंगो बापूजीला तो वरचेवर भेटत असे. त्यालाहि मुल्लाच्या भानगडी समजत होत्याच. त्याने त्याला एकदा "या कर्णाटकी चाळ्यानी नाश होईल." असा स्पष्ट इषारा द्यायला कमी केले नाही. अजिमुल्ला दोनअडीच वर्षे लंडनात धडपड करीत राहिला. पण त्याची कोणीच दाद घेई ना, किंवा त्याच्या अर्जाना जबाबहि मिळेनात. ‘हिंदुस्थान सरकारने जे केले त्यात ढवळाढवळ करण्याची आमची इच्छा नाही, असले जबाब मात्र त्याला तोंडी लेखी मिळाल्यामुळे’, तो निराश झाला. त्याला इंग्रेजांचा राग आला. त्याच्या मस्तकात सूडाच्या भावना उसळू लागल्या. पुलावा बिरयाणीइतका शिजलेला नानासाहेबाचा इंग्रजांविषयी विश्वास आणि याच्या स्वताच्या विलायती न्यायाविषयीच्या कल्पना धुक्यासारख्या हवेतल्या हवेत विरघळल्यामुळे इंग्रज जंटलमेन अॅण्ड लेडीजसाठी दिलेल्या मेजवान्या नाचपाट नि दारूबाजीसाठी उचळलेला पैसा मातीमोल झाला, याचा अजिमुल्लाला पश्चाताप झाला. इतक्यात २४ मार्च १८५४ ला रशिया विरुद्ध ब्रिटन फ्रांस नि सार्डिनिया यांत क्रिमियन युद्ध चालू झाले. अजिमुल्ला तुर्कस्थानात गेला.
तेथे त्याने प्रत्यक्ष समरभूमीवर, रशियाच्या तोफखान्यापुढे इंग्रजांची उडालेली हर्बलंडी स्वताच्या डोळ्यांनी पाहिली. आपण समजत होतो तसे इंग्रज मोठे काही अजिंक्य नाहीत. जबरदस्तापुढे हे पेदरू आहेत. रशियाची आम्हाला मदत मिळेल तर हिंदुस्थानातून या इंग्रेजांचे तेव्हाच उच्चाटण होईल, नानासाहेब पुन्हा पुण्याच्या मराठा गादीवर हिंदूंचा बादशहा म्हणून बसेल, अशा आशेने अजिमुल्ला रशियाचा अंतर्वेध काढण्यासाठी पिटरसवर्ग राजधानीला गेला. तेथून थोड्याच दिवसांत हिंदुस्थानाला परतून. झालेली सारी कहानी नानासाहेबाला त्याने सांगितली. नानासाहेबाच्या डोक्यात निराळाच उजेड पडला आणि तो आता अजिमुल्लाच्या सल्ल्याशिवाय पुढे पाऊल टाकीनासा झाला. तो केवळ त्याचा आत्मलिंगच बनला. अजिमुल्लाच्या लव्हाळ्यात सापडलेल्या अनेक आंग्ल तरुणींची प्रेमपत्रे त्याच्या दप्तरात इंग्रजी अधिकाऱ्याना सापडली. अजिमुल्ला खांसाहेबाना येथेच सोडून आपण रंगो बापूजीकडे वळले पाहिजे.
निराशाप्रुफ रंगोबाची धडपड
सतत बारा वर्षे रात्रंदिवस परिश्रमांची फलश्रुति काय? तर नकारघंटा! पण हाती घेतलेल्या कार्याच्या सचोटीबद्दल आणि प्रतापसिंहाच्या निर्दोषीपणाबद्दल रंगोबाची इतकी जबरदस्त खात्री होती का निराशेच्या घनदाट अंधारातहि दुर्दम्य आशावादाने तो पुढे पावले टाकीत निर्धाराने चालला होता. काय तो हे सारे स्वताचे पोट जाळण्यासाठी करीत होता? एकाद्या अधिकाराच्या उच्चतम स्थानासाठी तो जिवाचे रान करीत होता? काय तो त्या पूर्वजांच्या वतनासाठी, परदेशात कर्जबाजारी होऊन, उपांशीतापाशी पायपिट्या करीत लंडनचे रस्ते तुडवीत बसला होता? सातारचे राज्यहि आंग्रेजांच्या घशात उतरले होते. तोहि त्यांच्या डोळ्यात वडसासारखा सलत होता. राणीच्या राजीनाम्याने रंगोबा भिकेला लागून, स्वदेशी परत येईल, ही डलहौसीची कल्पनाहि त्याने खोटी पाडली होती. ‘राजा मेला तरी न्याय मेला नाही, बनिया कंपनी मेली नाही, मीहि मेलो नाही’, न्याय मिळत नाही म्हणजे काय? अशा बेगुमान हिंमतीने लंडनच्या बनिया अधिकाऱ्याना अखंड छेडणार्या रंगो बापूजीला `वतनासाठी धडपडणारा’ म्हणणार्याची काळी तोंडे अजूनही महाराष्ट्रात कधिमधी दिसावी, हे देशाचे दुर्दैव नव्हे काय?
लॉर्ड डलहौशीचा चुलता सर जॉन हॉबहौस हा कंट्रोल बोर्डाच्या चेअरमनच्या खुर्चीला चिकटून बसला होता, तो बारा वर्षे निसटला नाही. १८५२ च्या जूनमध्ये स्वारीला निवडणुकीत अपयश आले आणि जे. सी. हेरिस, पार्लमेंट मेंबर हा चेअरमन झाला. हा नवा चेअरमन तरी डॉ हॉबहौससारखा मुर्दाड, सैराट नि पाषाणहृदयी नसेल आणि तो सातारा प्रकरणाचे शुद्ध मनाने पर्यालोचन करून काही न्याय देईल, अशा आशेने रंगोबाने ता. २६ जुलै १८५२ रोजी त्याला एक मोठा मुद्देसुद अर्ज धाडला. दोस्तानीहि त्याचा पिच्छा पुरवायला कंबर बांधली. या अर्जाचा समारोप आजच्या परिस्थितीतहि हिंदी जनतेला विचारप्रर्वतक वाटेल, म्हणून मुद्दाम देत आहे.
‘‘महाराज, मलिका माआजमा महाराणीच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही, अशी इंग्लीशानी फुशारकी मारणे फार सोपे काम आहे. तसेच पूर्व दिशेकडे तोंड करून, डायरेक्टर लोक नेहमी मोठया दिलखुषीने बोटे दाखवून म्हणतात हे पहा आमचे हिंदुस्थानातले आलिज्यादा साम्राज्य म्हणणेहि सोपे आहे. पण इंग्लीश लोक म्हणजे काही संबंध जग नव्हे. विद्याचारसंपन्न नि शीलसंपन्न लोकानी गजबजलेले अनेक देश आजूबाजूला आहेत. त्या अनेक देशांतल्या निस्पृह लोकानी तुम्हाला प्रश्न टाकला की, `कायहो, सातारचे राज्य जसे तुम्ही घशात टाकले, त्याच साधनानी नि उपायानी हे तुमचे हिंदवी साम्राज्य कमावलेले आहे ना?` तर त्याला, मेहरबान, तुम्ही काय उत्तर द्याल? त्या साधनांची चौकशी कधी तुम्ही केलीच नाहीत, तर त्या लोकांना आपल्या प्रश्नाचे उत्तर काढायला काही कठीण नाही. सत्य इभ्रत आणि न्याय यांची इंग्रजाना खरोखरच काही चाड वाटत असेल, तर मी नम्रपणाने नि अत्यादराने प्रार्थना करतो की महाराज, आपण सातारा प्रकरणाची पक्षातीत बुद्धीने एकदा पुरी चौकशी करावी.
मेहेरबान, हिंदी राजे रजवाडे आणि जनता यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे, हे विसरू नका. यात अडचण काही नाही. लॉर्डांच्या नि कॉमन्सच्या कमिट्या पुन्हा नेमता येतील.दिवंगत सालस जनरल रॉबर्टसन खेरीज बाकीचे सारे सातारचे माजी रसिदंट जनरल ब्रिग्ज, लाडविक, कॅपटन प्रोटक आज हयात आहेत. येथे इंग्लंडातच आहेत. फिर्यादी नि न्यायाधिशाची भूमिका एकदमच बजावणारे कर्नल ओवान्स आणि विलोबी येथेच हयात आहेत. अहमदनगरचे जज्ज मि. हट्ट येथेच आहेत. त्यांनी महाराजाविरुद्ध जबानी लिहून घेतलेला गोविंदराव, बोलावणे पाठवले तर येथे वेळेवर हजर होईल आणि खोटा कबूलीजबाब काढण्यासाठी तुरुंगात आपले कसकसे हाल केले. ते तो इंग्रज जनतेच्या कानात ओरडून सांगायला चुकणार नाही. महाराजांच्या बंदिखान्यावर देखरेख करणारे ग.ज. चे माजी एजंट मेजर कारपेण्टर साहेबहि येथेच आहेत.
त्याचप्रमाणे सत्यशोधनाच्या कामी वयोवृद्ध सम्माननीय मौण्टस्टुअर्ट एलफिन्स्टन साहेबहि हातभार लावायला नकार देणार नाहीत. सगळे कागदपत्र पार्लमेंटने छापून काढले आहेत, तेव्हा संदर्भालाहि अडचण पडणार नाही, म्हणून मी पुन्हा चौकशी करा अशी आपल्याला प्रार्थना करीत आहे. आपल्या अफाट साम्राज्याच्या आणि अजिंक्य सामर्थ्याच्या इभ्रतीसाठी तरी आपण एका थोर मृत व्यक्तीच्या सन्मानासाठी चौकशी करण्याची भीक घाला. चौकशीची ही माझी शेवटची प्रार्थना जर धुडकावली गेली तर तुमच्या जबरदस्त पंजाखाली सापडलेल्या सगळ्या आशियातल्या राष्ट्राना जागृत करण्यासाठी मी माझ्या कोट्यवधि हिंदी बांधवांच्या नावाने टाहो फोडून ओरडून सांगेन की बापहो, जागे व्हा आणि या अंग्रेजाना नीट ओळखून सावध रहा. तुमच्या बनिया कंपनीला पुढची सनद देताना त्यात असे स्पष्ट करा की आंग्रेजी न्याय नीति म्हणजे केवळ अक्षांश रेखांशाचा प्रश्न आहे. उत्तर ३० पासून समांतर दक्षिणेकडे हिंदुस्थानात आणि केप ऑफ गुड होपच्या व्यामोत्तर पूर्वेकडे, सदगुण-दुर्गुण, दोष-निर्दोष, सत्य-असत्य यांच्या व्याख्या माणसांच्या कातडीच्या रंगावरून ठरविण्यात येतील.
गोरा माणूस, त्यातल्या त्यात बनिया कंपनीचा नोकर हा जन्मतःच सार्या सदगुणांचा सत्याचा पुतळा असल्यामुळे त्याने आपले पाप कबूल केले तरीहि त्याच्या हातून दुष्कर्म घडणेच शक्य नाही. आणि जेवडे काळे आदमी ते सारे दुर्गुणांचे दोषांचे अधिकारी म्हणून त्यांची निंदा अवहेलना, छळणूक, बंदिवास किंवा वाटेल त्या प्रकारची राक्षसी हेळणा आणि तीसुद्धा गुप्तपणाने करण्यात काही पाप नाही. असे एकदा तुम्हीच जाहीर करून टाकले म्हणजे सारी खटखटच मिटली, असे माझे आग्रहाचे सांगणे आहे. माझ्या राजाला नि त्याच्या मातोश्री राणीला अन्नान्न करून थकविण्याचे कर्म करूनच तुमचे ते हिंदवी सरकार थांबले नाही. पण गेल्या चार वर्षांत मला येणारा तुटपुंजा पगाराचा पैसाहि बंद पाडून त्यांच्या या एजंटाला उपाशी मारून त्याची येथली वटवट बंद पाडून जगण्यासाठी अखेर येथल्या इंग्रजी भिकाऱ्याच्या संस्थेकडे (इंग्लीश पॉपर्स यूनियन) जाण्यास त्याला भाग पाडण्याच्या कारवाया चालू आहेत.’’
या शेवटच्या शेर्याने हेरिस चेअरमन तर जखमीच झाला. त्याने जोसेफ ह्यूमला तोंडी सांगितले की साताऱ्याच्या राजाकडे रंगोबाचे किती देणे आहे. याचा तपशीलवार हिशोब त्याने पाठवला तर त्याचा मी विचार करतो. रंगोबाने हिशोब पाठविला पण पुढे काय? नामदार हेरिसहि हॉबीच्या खुर्चीतच बसलेले!
प्रकरण २९ वे
कायदेबाजीचा अट्टहास फोल ठरला
रंगो बापूजी नि त्याचे इंग्रज दोस्त इंडिया हाऊसला अर्जावर अर्ज करीत आहेत नि तेथलेपाषाण मूग गिळून स्वस्थ बसताहेत. या प्रकाराला आता तोडच दिसे ना. राजसबाई राणीकडूनस्वराज्याचा बेदावा लिहून घेतला, तरी त्यांच्या काशीच्या कर्जाच्या फेडीसाठी नि त्यांच्यादैनंदिन जीवनासाठी ब्रिटिशांकडून १८५२ साल संपत आले तरी दमडा आला नाही. म्हणजेराज्यापरी राज्य गेले आणि कोकलताना मनगट मोडलें, अशी काही विचित्र अवस्थाकाशीकरांची होऊन बसली. तुम्ही आमचे वकील, प्रतिनिधी किंवा एजंट कोणीहि नव्हता, असा (नातूच्या सल्ल्याने) राणीने रंगोवाला खलिता धाडला, तरी आम्ही इकडे उपाशी आहोत, तेव्हाहिंदुस्थान सरकारला आमची व्यवस्था करण्याबद्दल विलायतेचा दबाव पाठवावा, अशीकाकुळतीची चिटणीसाची पत्रे रंगोबाला दर डाकेला येतच होती. रंगोबा नि त्याचे दोस्त त्यापत्रांवर तात्काळ अर्जाअर्जी नि वृत्तपत्रांत शंखध्वनी करायचे. पण इंडिया हाऊसच्या फत्तरानाघाम फुटण्याचे चिन्हच दिसेना.
आईपासून भांडून निघालेली गोजराबाई १३ जानेवारी १८५० ला साताऱ्याला आली. सातारची आप्पासाहेबाची मंडळीच जेथे घरादाराला मुकलेली, तेथे हिचे आदरातिथ्य कोण करणार ? शेवटी शहरातच एका वाड्यात तिने आपली सोय लावली. जवळ होते नव्हते त्यावर कसाबसा गुजारा करून, ही बाई ३० आगष्ट १८५३ रोजी मरण पावली.
इंग्लीश दोस्ताची कामगिरी
आपल्या १४ वर्षाच्या लंडनवासात रंगोबाने शेदीडशे इंग्रज आपल्या कार्याला पाठिंबा देणारेदोस्त म्हणून स्नेहांकित केले होते. प्रतापसिंहाने रंगोबाला मृत्यूपूर्वी ९ दिवस जे गुप्त पत्रपाठविले, त्यात त्याने वर्तविलेले भाकीतच अखेर खरे ठरले. बिकट परिस्थितीपुढे बायको माणूसम्हणून राजसबाई टेकीला आली. (खरे म्हटले तर तिला कंपनीच्या हिंदवी अधिकाऱ्यानीजाणूनबुजून टेकीला आणली) आणि तिने राज्याचा बेदावा लिहून दिला. पण राजाज्ञेप्रमाणेरंगो बापूजी मात्र, प्रतापसिंहाच्या मृत्यूनंतर तब्बल सहा वर्षे लंडनात बनिया कंपनीच्यादगडधोंड्यांवर इमानाने माथे हापटीत राहिला. मुंबईला असताना डॉक्टर जॉन मिलन अणिकॅपटन कोगन यानी त्याला मदत केली. कोगनने तर त्याचे लंडनप्रयाण यशस्वी केले. लंडनातसर चार्लस फोर्स या वृद्ध गृहस्थाने रंगोबाला पोटच्या पुत्राप्रमाणे सांभाळले. सुविख्यात वक्तानि मुत्सद्दी जॉर्ज थॉमसन याने सतत आठ वर्षे प्रतापसिंहाच्या वतीने लेखन व्याख्यानांची कमाल केली. याबद्दल त्याला महाराजाकडून दरमहा २ हजार रुपये तनखाच (हणमंता पदाराने या थॉमसनच्या मासिक हुण्यांबाबत घालमेल करून चार हजार रुपयांची अफरातफर केली होती. याच्या विषयी २४-६-१८४८ च्या पत्रात यशवंतराव चिटणीसाला रंगोबाने स्पष्ट इषारा दिला की "ज्या लोकानी बखेडा करून घरफूट केली त्यातील हा तरकटी मुख्ये आहे. याची कर्णी व आचरण लिहिता फार विस्तार आहे. हा माणूस नातूचे आनुसंगाचा आहे व सातारियाहून बातमीबद्दल लाचलुचपतहि त्यास मिळत आली आहे.’’)
मिळत असे. अर्थात त्यांचा मृत्यू होताच, रंगोबाने त्याला रजा दिली सर जोसेफ ह्यूम, जे. सुलिवन, आर्थर ल्युईस, चार्लस ग्रोट, पॉइण्डर, वगैरे पन्नासावर डायरेक्टर नि प्रोप्रायटर, एक दमडीचीहि अपेक्षा न करिता, राजाची बाजू शुद्ध सत्याची आहे, या दुर्दम्य विश्वासाने, रंगोबाच्या हरएक हालचालीला हिरीरीने मदत करीत होते. प्रतापसिंहाचे चरित्र निकट सांनिध्याने अभ्यासलेले सातारचे रसिदंट रॉबर्टसन, ब्रिग्ज, लाड़विक, यानीहि रंगोबाला फार मदत केली.
पार्लमेण्टरी पेपर्सच्या प्रकाशनाने तर हिंदुस्थानच्या इतिहासात एक नवा मनू चालू केला. यावेळी आंग्रेचे हिंदवी सरकार कारभारात किती सडले कुझलेले होते. हिंदी राजांची आसने आंग्लाई कारवायांच्या लहरीवर डगमगत कशी उभी होती आणि शिलकी देशी राजांचे जीवन त्यांच्या गोर्या अरेराव रसिदंटांच्या मर्जीवर कसे हेलकावे खात होते याचा या पार्लमेण्टरी कागदपत्रांच्या प्रकाशनाने जगाला एक नवाच घाणेरडा देखावा दाखविण्याची कामगिरी बजावलेली आहे. हे कागद पार्लमेण्टच्या खर्चाने छापून घेण्याची बिकट कामगिरी जोसेफ ह्यूमने केली. हे कागद बाहेर पडल्यावरच प्रतापसिंहाला आपल्यावरील आरोपांची स्पष्ट कल्पना आली आणि त्याने २-१२-१८४४ चे पत्र लॉर्ड हार्डिजला लिहिले. हे पत्र कधीच प्रकाशात येऊ नये म्हणून येथल्या गोर्या अधिकार्यानी आपल्या जिवाचा आटापिटा केला. पण रंगोबाने ते लंडनच्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध करताच, मूळ प्रत मागविण्याशिवाय लंडनच्या अरेरावाना गत्यंतरच उरले नाही. "कंपनी नि तिचे कारभारी यांच्या दुष्कर्माविरुद्ध या कागदपत्रांनी हिंदुस्थानात असे भयंकर तुफान माजण्याचा संभव आहे, का त्याच्या सोसाट्यापुढे लीडनहॉल स्ट्रीटवाल्यांची एकमुखी सत्ता पायासकट उखडून, अखेर तिचा चोळामोळा होईल." असे भविष्य ब्रिटीश फ्रेण्ड ऑफ इंडिया मासिकाने आक्टोबर १८४६ च्या अंकात केले होते.
प्रतापसिंहाच्या आत्मयज्ञाची फलश्रुति.
मेजर बसू आपल्या स्टोरी ऑफ सातारा ग्रंथात (पान १८२) म्हणतात, प्रतापसिंह दक्खनचा एक राजा एवढ्या संकुचित भावनेने त्याच्या जीवनाची स्मृति न आदरिता, उभ्या भरतखंडातल्या जनतेने त्या स्मृतीला अत्यादराने प्रणाम केला पाहिजे, इतकी ती थोर नि उदात्त आहे. भारतीय लोकाना कॉन्स्टिट्यूशनल चळवळीची आद्य कल्पना देण्यात प्रतापसिंहाचाच खजिना खर्ची पडलेला आहे. आमचे नागरी हक्क काय आहेत नि ते कसे सांभाळावे नि त्यांच्यासाठी कसे झगडावे, याची कायदेबाज लढाई देण्याचे शास्त्र शिकवणारा जॉर्ज थॉमसन राजाच्याच खर्चाने हिंदुस्थानला भेट द्यायला आला होता. भारतीय जनता नि संस्थानीक यांच्या तक्रारी
इंग्लडच्या जनतेपुढे मांडून, त्यांचा निरास करून घेण्याच्या चळवळीचे तंत्र प्रतापसिंहाच्या पैशाने अस्तित्वात आलेले आहे. ब्रिटीश इंडियन सोसायटीची स्थापना, ब्रिटीश इंडियन अॅडव्होकेट,ब्रिटीश फ्रेण्ड ऑफ इंडिया, इंडियन एक्झामिनर वगैरे मासिके नि वृत्तपत्रे या राजाच्याच खर्चाने अस्तित्वात आली नि त्याच्या मृत्यूच्या क्षणापर्यन्त त्याने पोसली. विलायतेच्या लोकांच्या डोळ्यात त्यांच्या बनिया कंपनीच्या अरेरावी कारभाराबद्दल खऱ्याखुऱ्या वस्तुस्थितीचे अंजन घालून, त्यांच्या विवेकाला धक्के देण्याची बहुमोल कामगिरी या पत्रानी बजावलेली आहे. [कै. बाळ गंगाधर टिळक लंडनला गेले त्या वेळी तेथे चालू असलेले] इंडिया पत्र प्रतापसिंहाच्या या अनेक नियतकालिकांचेच वंशज होते. रंगो बापूजी हा तर इंग्लंडातला पहिला हिंदी चळवळ्या म्हणून त्याचे नाव अजरामर राहील. हिंदी प्रश्नांबद्दल इंग्रेजी जनतेपुढे जाहीर व्याख्याने देणारा हाच पहिला राजकारणी पुरुष, त्याच्यानंतर दादाभाई नवरोजी, लालमोहन घोरा, सुरेन्द्रनाथ बनर्जी वगैरे मंडळी यानी तो मार्ग अलिकडे चोखाळलल्याचे सर्वश्रुत आहे. परंतु प्रतापसिंहाची सर्वोत्तम कामगिरी कोणती झाली असेल तर ती हीच की हिंदुस्थानचे रक्त चोखायला सोकावलेल्या बनिया कंपनीच्या बेदाद कारभाराचा भोपळा त्याने लंडनच्या चव्हाट्यावर फोडून, त्या कंपनीला आपला गाशा गुंडाळायला भाग पाडले.
आकाशच फाटल्यावर ठिगळ कोठे लावायचे?
प्रतापसिंहाचा मृत्यू झाल्यापासून पुढे सहा वर्षेपर्यन्त रंगो बापूजीला हिंदुस्थानातून एक दिडकीहि हातात लागली नाही. तरीहि त्याने धैर्याने नि नेटाने आपली चळवळ चालूच ठेवली. या कामात त्याला १० हजार पौंड कर्ज झाले. (अंदाजे १ लाख रुपये). इंग्लंडात त्याला भिक्षाहि मागण्याची सोय उरली नाही. हिंदुस्थानात वर्गणी जमविण्याची त्याचा बंधू रावजी बापूजी याने खटपट चालविली, तिला मुंबई सरकारने मोडता घालून ती बंद पाडली. हजार वेळा नकार दिला तरी मी छत्रपतीचा वकील आणि अलिकडे तर मयत राजाचा मी ट्रस्टी नि बालछत्रपतीचा गार्डियनम्हणून तो मिरवू लागला. हेच येथल्या नि लंडनातल्या बनिया अरेरावाना सहन झाले नाही. रंगो बापूजी या १४ वर्षांच्या लंडनच्या खटपटीत पैसा नि प्रकृती दोनीहि सफाई गमाऊन बसला. शेवटी त्याच्या अनेक इंग्रज दोस्तानी इंडिया हाऊसवर जोरदार दडपण आणून, त्याचे कर्ज फेडून हिंदुस्थानात परत जाण्यासाठी पैशाची सोय लावली आणि सन १८५३ च्या दिसेंबरात रंगो बापूजी मुंबईला जाण्यासाठी बोटीवर चढला.
गेली चवदा वर्षे आपल्या राजासाठी न्याय मिळवण्याकरिता सर्वस्वाचे बलिदान करणारा रंगो बापूजी आता मायदेशाला परत जाणार, या बातमीने त्याचे शेकडो इंग्रज दोस्त कष्टी झाले. इंग्लंडातल्या कौण्टीकोण्टीमधले अनेक स्त्रीपुरुष त्याला भेटीभवरी घेऊन भेटायला धावले. अखेर सर्व मित्रानी एक मोठी जाहीरसभा भरऊन रंगोबाच्या स्वामीनिष्ठेचे, त्याच्या कर्तबगारीचे सद्वर्तनी नि चोख धार्मिक रहाणीचे गुणगायन केले आणि इंग्लीश जनतेच्या आदराची नि प्रेमाची आठवण म्हणून त्याला आठरा पाकळ्यांचे एक मोठे चांदीचे तबक नजरकेले. त्या पाकळ्यांत खालील दोस्तांची नावे कोरलेली आहेत.
(१) जोसेफ ह्यूम, एम. पी.
(२) जॉन ब्राईट, एम. पी.
(३) हारफर्ड जोन्स,
(४) जॉर्ज थॉमसन,
(५) सर हारफर्ड जे बायजीस,बॅरोनेट
(६) जॉन सुलिवन,
(७) जॉन ब्रिग्ज,
(८) मे, ज. आर. रॉबर्टसन,
(९) बी. मरे,
(१०) फ्रान्सिस कारनॅक बौन
(११) ए. कर्झन,
(१२) जेम्स ग्रांट डफ,
(१३) जॉन बुल
(१४) जेम्स मालकमसन,
(१५) विल्यम हे कीथ,
(१६) चार्लस मुडी,
(१७) डी. देलामोते. ले. ज.
(१८) थॉमस प्रीट,
(१९) विल्यम एच स्टीफन्स,
(२०) कॅरोलीन कोगन,
(२१) जॉर्ज लेस्ली.
(२२) जॉन विल्सन,
या तबकाच्या मध्यभागावर कोरलेल्या इंग्रजी मजकुरात म्हटले आहे :
“धन्याची एकनिष्ठेने सेवा बजावणाऱ्या रंगो बापूजीला १४ वर्षांच्या कष्टप्रद हद्दपारीनंतर स्वदेशी परत जाताना आदर नि प्रेमाच्या भावनेने अर्पण केलेले स्मृतिचिन्ह.” जिवाभावाच्या दिलदार नि सहकारी दोस्तांकडून यापेक्षा अधिक मोलवान आहेर
(या तबकाचीही एक कर्मकहाणी आहे. वास्तवीक ते रंगोबाच्या बरोबर मुंबईला येऊन, कारीला रवाना झालेले होते. पण पुढे सत्तावनच्या स्फोटात कंपनीच्या सोजरानी, रंगोबाच्या तसबिरीसाठी त्याचे कारीचे राहते घर जमिनी मितीसकट खणून उकरून काढले, सारे कागदपत्र पुस्तके जाळून राख केली. मिळेल ती मोलवान चीज लंबे केली. त्या धुडगुसात या तबकाचीहि वाताहात लागली होती. सन १९०६ साली सुप्रसिद्ध हिंदी एडिसन कै. प्रो. शंकरराव आबाजी भिसे हे सहजगत्या लंडनातल्या एका क्युरिऑसिटी शॉपमध्ये (नवलाईच्या वस्तु विकण्याचे दुकानात) गेले असता, त्याना हे तबक तेथे विक्रीला ठेवलेले दिसले. कोरलेला मजकूर वाचताच ते थक्क झाले. हे तबक येथे कसे आले? दुकानदाराला किंमत विचारता त्याने पांच पोऊंड सांगितली. शंकर रावजीनी तात्काळ ती देऊन ते तबक विकत घेतले आणि पुण्यास आपल्या बंधूचे हवाली केले. ते त्यांच्या संग्रही अजून आहे. त्याचा फोटो या ग्रंथात जोडला आहे.)
आणखी तो कोणता?”
A Memorialof Sincere Respect and Esteem
TO
RajamaniaRajasree RUNGO BAPOJI of Sattara
For 14 years the Vakeel of H. H. PertaubShewun
RAJAH OF SATTARA
Upon his leaving England and returning to India
after his long and painful exile presented by his friends
THE SUBSCRIBERS.
London, November, 1853.
प्रतापसिंहाचा वकील रंगो बापूजी मुंबईला येण्यासाठी निघाल्याची बातमी लंडनच्या वर्तमानपत्रावरून मुंबई, कलकत्ता येथल्या पत्रांनी छापताच, सबंध हिंदुस्थानात कुतुहलाची नि रंगोबाला डोळ्यानी पाहण्याच्या आतुरतेची एकच लाट उसळली. लंडनच्या अनेक पत्रांनीरंगोबाच्या लोकविलक्षण कर्तबगारीची वहावा करणारे लेख लिहून त्याला प्रेमाचा निरोप दिला. डेली न्यूज ने म्हटले. "आपल्या झोकदार पौर्वात्य पोषाखात नेहमी नजरे समोर वावरणारा रंगो बापूजी कोण, हे वेस्टएण्डच्या रहिवाशाना सांगायला नकोच. मराठी स्वराज्याचा शेवटला तुकडा वाचविण्यासाठी, निराशेची पर्वा न करता, अखंड बारा वर्षे झगडत रंगोबा आपल्यात मिसळून राहिलेला होता. या मनुष्याचे नैतिक मोल काय आहे. याची मात्र फारच थोड्याना काही कल्पना असेल. जन्माने हा मराठा. आपादमस्तक सच्चा जंटलमन, उच्चवर्णीय हिंदु असल्यामुळे, हा आपल्या धर्मकर्माना येथेसुद्धा फार कसोशीने आचरीत असे.
हिंदू धर्माच्या विधिकर्माचा तपशील ज्याना माहीत असेल, त्याना ते विधि इंग्लंडमध्ये यथासंग पार पाडताना त्याला किती अडीअडचणी सोसाव्या लागल्या असतील, याची कल्पना होईल, त्याची आपल्या धन्याच्या नि त्याच्या राजकुटुंबाच्या पायी कमाल निष्ठा असे. त्याचे वडील १०० वर्षाचे होऊन नुकतेच वारले. त्यानी मरतेसमयी त्याला धैर्याने कर्तव्य पार पाडायला चुकू नकोस, असा मृत्युशय्येवरून निरोप पाठवला होता, बस्स, अढळ स्वामी निष्ठा नि पित्याचा तो संदेश, या दोनच गोष्टीने थरारून, रंगोबा आपल्या प्रयत्नांची येथे शिकस्त करीत राहिला होता. त्याने फार हाल सोसले, रात्रदिवस तो सारखा श्रमच करताना आढळायचा.
माझ्या धन्याला अन्यायाने वागविले आहे, ही त्याची एकच आरोळी असे. नकाराच्या थपडानी तो डगमगला नाही. कोणी झिडकारेल तर कष्टी झाला नाही. इंग्रजी राष्ट्राच्या हृदयाच्या तारा बिनचूक हालवून मी माझ्या धन्यावरील अन्यायाचे परिमार्जन करून घेईन, हा त्याचा एकच निधडा विश्वास, अखेर बिचाऱ्याचा धनि दुर्दैवाने परलोकी गेला. त्याचा काशीचा सर्व आधार नाहीसा झाला. अशाहि अवस्थेत त्याने हिंदुस्थानातले आपले घरदार विकून टक्के केले आणि नाहीनाही तरी स्वताच्या पदरचे १० हजार पौंड खर्च करून तो येथे आपल्या राजासाठी झगडत राहिला. त्याच्या कर्तव्यनिष्ठेची किती वहावा करावी? रसातळाला गेलेल्या राजवंशासाठी इतक्या निस्सीम भक्तीने झगडा देण्याचे थोर कार्य रंगो बापूजीशिवाय केलेले इतरत्र कचितच आढळेल. बिचाऱ्याने दुर्दैवाचे अनेक फेरे नि संकटे येथे अनुभवली. आता स्वदेशी परत गेल्यावर त्याची शुद्धि होऊन तो पुन्हा जातीत नि धर्मात प्रविष्ट व्हायला आणखी किती त्रास त्यास भोगावा लागेल कोण जाणे!"
चवदा वर्षे अखंड झगड़ा देऊनहि अखेर पदरात काहीच नाही! दस्तऐवजी पुराव्यानी बनिया कंपनीच्या अनेक हिंदवी अधिकाऱ्यांची पातके इंग्लंडच्या चव्हाट्यावर मांडली, तरीहि गुन्हेगार सफाई निसटून सुखरूप राहिले नि फिर्यादी प्रतापसिंह नि त्याचा प्रतिनिधी वकील रंगो बापूजी भिकेला लागून रसातळाला गेले! हा मुकाबला नि वॉरन हेस्टिग्जविरुद्ध बर्क, शेरिडन, फॉक्स यानी दिलेल्या लढ्याचा मुकाबला एकाच सूत्रा गोत्राचा ठरला. रंगो बापूजी नि त्याच्या इंग्रजी दोस्तांप्रमाणेच बर्फ शेरिडन ही मंडळी हेस्टिग्जच्या अनंत घाणेरड्या पातकांचे माप त्याच्या पदरात घालून, त्याला शासन व्हावे म्हणून चवदा वर्षे अखंड झगडले. त्यातली आठ वर्षे तर प्रत्यक्ष खटला चालवण्यातच गेली. अखेर काय झाले? वॉरन हेस्टिंग्ज, या खटल्यामुळे भिकेला लागला तरी, शीरसलामत निर्दोषी म्हणून सुटला. या खटल्यातल्या बर्कच्या अपयशाबद्दल विवेचन करताना लॉर्ड मोर्ले आपल्या बर्कचरित्रात म्हणतात,या खटल्यातला आरोपी तांत्रिकदृष्ट्या जरी सुटला तरी बर्कच्या चवदा वर्षाच्या धडपडींचा अखेर विजयच झाला. कसा म्हणाल तर हिंदुस्थानाविषयी नीतिपूर्ण, न्यायी उदार आणि जबाबदार अशा इंग्लीश लोकमताचा इंग्लंडमध्ये पाया घातला गेला. यावर मि. डिग्बीने टीका करताना म्हटले की "अरेरे, बिचार्या या इतिहासकाराचा आशावाद भलताच प्रामाणिक दिसतो. त्याच्या या वर्णनात वस्तुस्थिति मात्र ठाकठीक बसत नाही."
रंगो बापूजीच्या अपयशाने हिंदुस्थानाला त्या वेळी एक मात्र ठसठशीत धडा शिकविला की आज हा प्राणी कॉन्स्टिट्यूलिझम (कायदेशीर शाब्दिक वादविवादा) चा केवढाही अट्टहासी पुरस्कार करील असला, तरी त्याच्या साम्राज्यशाही स्वार्थाचा प्रश्न आला का कायद्याना नि वायद्याना मिळून हव्या त्या अत्याचाराने स्वार्थाची भूक भागवायला तो मागेपुढे पहाणारा नाही. तुमच्या आमच्या आठवणीतील दोन युरपियन महायुद्धे अंग्रेजानी शस्त्रास्त्रांच्या बळावर न जिंकता, पोलिटिकल डिप्लोमसीच्या (राजकरणी शाब्दिक दगलबाजीच्या) सामर्थ्यावरच जिंकलेली आहेत आणि या बाबतीत आज तरी इंग्लंड निर्वीर्यमूर्वीतलम् असेच आहे.
मुंबईच्या धक्क्यावर चमत्कार
रंगो बापूजी येणार म्हणून त्याला पहाणयासाठी ग्वालेर, दिल्ली, कराची, इंदूर, धार, नागपूर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगांवापासून हजारो लोक मुंबईला धावले. त्याचप्रमाणे लंडन मुंबईच्या अधिकार्यातहि आगाऊच काहीतरी विशेष धोरणाची सांकेतिक डाकाडाकी झालेली होती. धोंडोपंत नानासाहेबाचा मुसलमान वकील अजिमुल्लाखान आंग्रेजाना उघडउघड शिव्या देत तुर्कस्थान रशियाकडे गेल्याची बातमी लंडन टाइम्सचा बातमीदार रसेल याने छापली होती. अजिमुल्ला वर्ष दीडवर्षच झगडला नि संतापून परतला. पण रंगोबा तर सारखा १४ वर्षे लंडनला राहून त्याने इंडिया हाऊसच्या राजकारणी अब्रूचे इंग्लंडातच निखारे केलेले! असला माणूस हिंदुस्थानात परत गेल्यावर तेथे आणखी कसल्या बंडाळीचा उपद्याप करील, याचा नेम नव्हता. बनिया कंपनीचा देशी विलायती कारभार हे काय गौडबंगाल आहे, त्यांचे शासनतंत्र काय माया आहे, आणि रंगो बापूजी तर खुद कारन्याक गवर्नरवर खटला करायला उठलेला.
या सगळ्या गोष्टी त्याच्या मोडी नि इंग्लिश पुस्तकाच्या शेकडो प्रतीनी लोकाना समजल्यामुळे, गर्वनरादि गोर्या अधिकाऱ्यांचा लोकावरील वचक बराच ढिदिला पडला होता. मानला तर देव नाही तर धौडा यांच भावनेने गोर्या अधिकार्याकडे पाहण्याइतके लोक धीट बनत चालले होते. प्रतापसिंहाच्या हालअपेष्टांपेक्षा, त्याच्या अकाली मृत्यूने आणि पाठोपाठ सातारा राज्याच्या वसाहतीने अंग्रेजांविरुद्ध सबंध हिंदुस्थानाचे लोकमत चांगलेच खवळलेले होते. बाहेर कोणी बोलत नसला, तरी अंतर्यामी मराठी जनता संतापलेली होती, हे न समजण्याइतके मुंबईचे अरेराव आंधळे किंवा गाढव खास नव्हते. खुद्द इंग्लंडला राहून इंग्लीश अधिकाऱ्यांची बेगुमान जाहीर भंबेरी उडवणारा रंगो बापूजी, या दृष्टीने हिंदी जनता त्याच्याकडे कौतुकाने नि आश्चर्याने पहात होती. तर मुंबईकर सरकारी शहाणे आता रंगोबाला ‘बनवून’ गार करण्याच्या उद्योगात होते.
रंगोबा १८५३ च्या दिसेंबर अखेर लंडनहून निघाला. मध्यंतरी तो माल्टाला थोडे तास उतरून तेथल्या ठरावीक ठिकाणांचे दर्शन त्याने घेतले. माल्टाविषयी त्याला विशेष काहीतरी वाटायचे. १८५४ च्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तो मुंबई बंदरात उतरणार, या बातमीने मुंबईला बाहेरगावच्या पाहुण्यांची आणि रंगोबाच्या नातेवाईकांची एकच गर्दी उडाली. रंगोबाची स्वारी बोटीतून उतरून, होडीत बसून धक्क्याकडे येत असताना, हजारो लोकानी त्याचा जयजयकार केला. धक्क्यावर येताच त्याला मुंबईचे पोलीस अधिकारी यानी गराडा घालून सांभाळले. जगन्नाथ नाना शंकरशेट, सर जमशेटजी जिजीभाई यानी त्याला हार घालून क्षेमालिंगने दिली. पाठारे प्रभु चौकशी पाचकळशी, भंडारी नि कोळी समाजाच्या पुढार्यानी त्याचा सन्मान केला. इतक्यात मुंबई सरकारचा एक बडा अधिकारी पुढे येऊन, त्याने रंगोबाशी हस्तांदोलन केले, थोडीशी बातचीत केली आणि तयार असलेल्या सरकारी ब्रूम गाडीत त्याला बसवून घेऊन गेला. रंगोबाचा परिवार आणि सामानसुमान व्यवस्थित पोहोचविण्याचे काम पोलीस करू लागले, रंगोबाच्या बरोबर एक गोरा हापसर लंडनहून आलेला होता, तोहि त्याच्याबरोबरच गाडीत बसून गेला. रंगोबाला नेला तरी कोठे? भेटीला आलेल्या लोकाना नि घरच्या मंडळीना काही अंदाज लागेना! अखेर थोड्याच वेळाने बातमी मिळाली की मुंबई सरकारने रंगोबाच्या बिऱ्हाडाची सोय परळला गवर्मेण्ट हौसच्या शेजारीच लवजी गलबतवाल्याच्या बंगल्यात केलेली आहे म्हणून.
मग काय! लोकांची झुंबड तिकडे लोटली. लोकांच्या गर्दीचा नि उत्साहाचा अंदाज घेऊन सरकारने तसाच पोलीस बंदोबस्त ठेवला होता. बंगल्याच्या दरवाज्यावर सकाळ संध्याकाळ भेटीच्या वेळा ठरवणारा जाहीरनामा लावला. त्या त्या वेळी रंगो बापूजी बंगल्याच्या बालकनीत येऊन, खाली जमलेल्या लोकसमूहाला नम्रपणे नमस्कार करायचा. असा हा दर्शनाचा क्रम पंधरा दिवस सारखा चाललेला होता. मुंबई सरकारने रंगोबाच्या बिर्हाडा खास सरकारी व्यवस्था नि सरबराई केली आणि त्याच्याबरोबर एक गोरा हापसरहि आलेला, तेव्हा सातारा राज्याच्या बाबतीत काही अनुकूल निकाल मिळवूनच तो आलेला असला पाहिजे, अशीहि बाजारगप जिकडे तिकडे उठल्याशिवाय राहिली नाही. पुष्कळ लोक त्याला बंगल्यात भेटायला गेले. पण त्याने क्षेमसमाचारापलिकडे विशेष काही कोणाला सांगितलेच नाही.
रंगोबाचा भाऊ रावजी, मुलगा सीताराम, दोन पुतणे यशवंतराव नि वामनराव, पत्नी काकई आणि इतर जवळचे काही नातेवाईक मुंबईला आले होते. त्यांतच वरील माहिती प्रत्यक्ष पाहून मला सांगणारे कै. नरहर परशराम वैद्य हेहि आलेले होते. त्यावेळी ते १२ वर्षे वयाचे होते. नुकतीच यांची मुंज झालेली होती. नरहरपंत ऊर्फ काका वैद्य म्हणाले. भाऊ काका (रंगोबा) विलायतेला गेला. तेव्हाच त्याची पन्नाशी झालेली होती. परत आला तेव्हा त्याचे सारे केस पिकले होते. वर्ण निमगोरा पण आता लालबुंद झाला होता. कपाळावर आठ्या दिसू लागल्या होत्या. चर्या इतकी पाणीदार का त्याच्या डोळ्याला डोळा भिडऊन भाषण करणे कठीण. १४ वर्षे लंडनला काढल्यामुळे तो अस्खलित इंग्रेजी बोलताना पाहून इकडील लोकाना मोठे आश्चर्य वाटायचे, आम्ही सगळे त्याला भेटलो तेव्हा, काय सांगावे, सगळ्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.
अहो साता समुद्रापलिकडच्या १५ वर्षांच्या हदपारीनंतरच्या त्या गाठीभेटी तेव्हा त्या प्रेमाच्या उमाळ्याला दाबणारा कोण कसा? तशात भाऊंचे वडील आण्णा दोनतीन वर्षापूर्वी मरण पावलेले, भाऊकाकाचाहि ऊर भरून आला. आण्णांचे शेवटचे दर्शनसुद्धा नाही मला असे म्हणून ते रडू लागले. सगळे भेटले पण काकई? ती हो कशी भेटणार? ती मुंबईला आमच्याबरोबर आली होती. पण भाऊकाका विलायतेहून आलेला! बाटला! प्रायश्चित घेतल्याशिवाय तो शुद्ध कसा होणार? शुद्ध झाल्याशिवाय बायको त्याचे दर्शन कसे घेणार? अशी जुनी मते आमच्या लोकाची त्या वेळी. प्रायश्चिताचा प्रश्न निघायची थातड, धर्ममार्तण्डाच्या टोळ्या परळला वेढा देऊन उभ्या. अखेर शुद्धिविधि झाला, भटभोजन झाले, दक्षिणा वाटल्या, तेव्हा रंगो बापूजी पंक्तिपावन झाले. मग काकई दर्शनाला येऊन त्यांच्या पायावर तिने मस्तक ठेऊन नमस्कार केला.
रंगो बापूजीने निरनिराळ्या विषयांवरची शेकडो इंग्रजी पुस्तके, वर्तमानपत्रांतल्या कात्रणांची बांधीव बुके, नकाशे, हस्तलिखित पत्रव्यवहारांचे चामडी रुमाल आणि अनेक विलायती चिजा बरोबर आणल्या होत्या त्या सर्व कारी येथे (रोहिडखो-यातल्या त्याच्या गांवी) पाठविण्यासाठी बारा खटारे लागले.
मुंबईला पाऊल ठेवल्यापासूनच रंगोबाच्या बरोबर आलेला झीलसाहेब `सकाळ संध्याकाळ शेजारच्या गवर्मेण्ट हौसवर जातयेत असायचा, अधूनमधून रंगोबाही त्याच्याबरोबर कागदपत्रांचेचा मडी रुमाल घेऊन जायचा. प्रायश्चित विधि आटोपल्यानंतर लागलीच रंगोबाने काशीला जाण्याची तयारी केली झीलसाहेब मुंबईलाच राहिला.
काशीला जाऊन रंगोबाने राणी राजसबाई नि बालराजे शाहू याचे दर्शन घेतले. सर्व परिस्थिति समजाऊन सांगितली. तेथून एजंट मेजर स्टुअर्ट याच्या मार्फत मुंबई सरकार नि कलकत्ता सरकारकडे तातडीची अर्जाअर्जी करून, नेमणुकीच्या रकमांची आणि सातारला परत जाण्याची व्यवस्था लाऊन घेतली. इतक्या वर्षे नेमणुकीच्या रकमा देण्याला मुंबई सरकारनेच खो घातलेला होता. पण आता, लंडन-मुंबई-कलकत्ता येथे काही सांकेतिक घटना घडल्यामुळे काशीकर मंडळींच्या मागण्यांची अखेर दाद लागली आणि ती ३ जुलै १८५४ रोजी परत सातारला येऊन दाखल झाली.
ही व्यवस्था लाऊन रंगो बापूजी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईला परत येतो तो त्याला बातमी समजली की लवजी गलबतवाल्याच्या बंगल्यात झीलसाहेब सर्पदंश होऊन मरण पावला! तो तसाच तेथे गेला. जाताच साहेबाची लोखंडी पेटी कोठे आहे? असा प्रश्न त्याने तेथे पहार्यावर असलेल्या पोलिसांना केला. पेटीबिटी आम्हाला काही माहीत नाही, साहेब मात्र पंधरा दिवसापूर्वी साप चाऊन मेला. एवढाच खुलासा मिळाला. रंगोबा गंभीर झाला. त्याच्या भुवया चढल्या. मस्तकाच्या शिरा तटाटून उठल्या. या पाहुणचारात असे कपट होतेकाय! ठीक आहे, पाहून घेईन असे बडबडत तो बाहेर पडला आणि तडक मावळात आपल्या कारी गावी निघून गेला. हा झीलसाहेब कोण? लंडनहून रंगोबाच्या बरोबर तो आला होता कशाला? त्या लोखंडी पेटीत काय रहस्य किंवा गूढ होते? याचा खुलासा कधीच कोणाला झालेला नाही. रंगो बापूजीच्या अनेक गूढांपैकी ते एक गूढ गूढच राहिले.
साताऱ्याची झालेली वाताहात
सन १८४८ साली सातारा राज्य खालसा झाल्यापासून रंगो बापूजी स्वदेशी परत येईतोवरच्या सहा वर्षांत, सातारा राजधानीची नि राजकुटुंबाची आंग्रेजी कायदेबाजीने पुरी धुळधाण उडऊन टाकलेली होती. मागे प्रतापसिंहाच्या वेळी, सातारा किल्ला आंग्रेजानी जिंकून मग तो छत्रपतीच्या हवाली केला असे दर्शविण्यासाठी, प्रथम किल्ल्यावर तोफा डागल्या, छत्रपतीचे निशाण उतरवले, आग्रेजांचे चढवले नि नंतर लगेच पुन्हा थोड्याच वेळाने युनियन जॅक खाली उतरऊन, छत्रपतीचा भगवा झेण्डा चढवला आणि तोफांची सलामी दिली, हा नाटकी प्रकार वाचकांच्या लक्ष्यात असेलच. राज्य खालसा केल्याचे जाहीरनामे फडकले त्या दिवशी राजवाड्यांसकट सर्व राजधानी नि राज्य आंग्रेजीबहादुरांचे झाले, हे सिद्ध करण्यासाठी, राजकुटुंबातल्या सर्व मंडळीना राजवाड्याबाहेर काढण्याचा कायदेबाज विधि उरकणे अगत्याचे होते. सर्व मंडळी नाइलाजाने बाहेर पडली. पण राणी सगुणाबाई मात्र संतापाने फणफणत हट्टाने बाहेर येईना.
आजूबाजूच्या पगडबंदानी समजूत घालण्याची पराकाष्ठा केली. पण आमच्या घरातून आम्हाला बाहेर रस्त्यावर काढणारे आंग्रेज हे कोण? असा तिने त्रागा चालविला. अखेर एका गोऱ्या मेजराने तिला हात धरून बाहेर ओढीत आणली आणि लगेच तिच्यासह सर्व मंडळीना वाडयात जाण्याचा हुकूम करण्यात आला. या एवढ्या बेजबाबदार आकांडतांडवाचा हेतू काय? तर आता सातारा राज्य नि राजवाडे कुंफणी बहादुर सरकारचे आहेत आणि राजकुटुंबाला सरकार आपल्या महाकृपेने ते मेहेरबानी म्हणूनच तेथे राहण्याची सवलत देत आहे, हे कायदेशीर रीतीने ठरऊन घेण्यासाठी! कायदा गाढव असला तरी त्याच्या अंमलबजावणीसाठी आंग्रेजी अधिकारी, त्या वेळी काय नि आता काय, कसकशा प्रकारचा गाढवपणा करतात हे सर्व असल्यामुळे त्या मानी शिववंशज राजकुटुंबियांच्या संतापजनक हेळणेबद्दल अश्रूचा एक थेंब गाळून, पुढे सरकावे हेच बरे.
राजकुटुंबाला रहाण्यासाठी एक राजवाडा (आणि तोहि सगुणाबाईच्या हयातीपर्यन्तच) ठेऊन, शहरातल्या बाकीच्या काही इमारती सरकारने लिलावाने विकल्या. काही म्युनिसिपालिटीच्या हवाली केल्या. काही सरकारी कोर्ट कचेर्याना घेतल्या. काही पाडून टाकल्या. राणी सगुणाबाई आपल्या प्रसिद्ध अपिलात म्हणते. "ज्या जागांवर आमच्या थोर पूर्वजानी बांधलेले अनेक शोभीवंत प्रासाद वैभवाने चमकत उभे होते, जेथे आमचे पराक्रमी पूर्वज तमाम हिंदुस्थान देशाचे मुजरे घेत घेत ऐश्वर्याने राहिले, त्याच जागांवर आज सार्वजनिक संडास बांधण्यात आलेले दिसताहेत. आमच्या हुजरे शिपायांसाठी बांधलेल्या जागांत आम्ही यापुढे रहावे. असा कंपनी सरकारचा हुकुम झाला आहे." एवढेच नव्हे, तर सगुणाबाईने किंवा तिच्या दत्तक पुत्राने एरवीच्या व्यवहारात स्वताला राणी अगर छत्रपति राजा इत्यादि मायने वापरू नयेत आणि लोकानीहि त्यांना तसल्या मायन्यानी संबोधू नये, असेहि हुकूम जारी करण्यात आले होते. `पुन्हा तुम्ही स्वतःच्या नावामागे महाराणी किंवा राजा छत्रपति असे मायने जोडून सरकारकडे पत्रव्यवहार केल्यास, त्याची दाद घेण्यात येणार नाही` असेहि रसिदंटाकडून आणि पुण्याच्या पोलटिकल एजंटाकडून अनेक वेळा सगुणाबाईला नि राजपुत्राला धमकावण्यात येत असे.
सातारा राजधानी नि तेथल्या राजकुटुंबाची अशी दैन्यावस्था असतानाच, काशीची वनवासी मंडळी तेथे येऊन दाखल झाली. दोनीहि कुटुंबे विपन्नावस्थेच्या एकाच पातळीवर आलेली असल्यामुळे, ‘समानशीले व्यसनेषु सख्यम्’ नियमाने कोंड्याचा मांडा करून भवितव्यासाठी अर्जाअर्जीने आंग्लाई जाळ्याचे दोर कुरतडीत राहिली. काशीची मंडळी सातार्याला आल्यावर रंगो बापूजी त्याना भेटण्यासाठी साताऱ्याला आला होता. या वेळी त्याने डोकीचे केस नि दाढी वाढवायला सुरूवात केली होती. पागोटे टाकून, मस्तकाला रुमालाचे फडके गुंडाळले होते. आंगात पायघोळ अंगरखा आणि खांद्यावर उपकरणे, असा त्याचा वेष होता.
प्रकरण ३० वे
सत्तावनच्या बंडात रंगो बापूजीचे स्थान
रंगो बापूजीच्या लंडनातल्या न भूतो न भविष्यति अशा धडपडीनी हिंदुस्थानात आणि आजूबाजूच्या आशियन राष्ट्रांत आंग्रेजी साम्राज्यवादी राजकारणाची छीथू उडाली. हिंदी राजेरजवाडे आणि जनता यांच्यात अंग्रेजांविषयी कमाल द्वेषाची भावना फैलावली. डायरेक्टर प्रोपायटरांची कोर्टे, कंट्रोल बोर्ड नि पार्लमेण्ट यांनी प्रतापसिंहाच्या उघड चौकशीच्या मागणीला कटाक्षाने डावलून, आपल्या गोऱ्या हिंदवी कामगारांची कातडी बचावण्याची कसरत केली, तरी रंगोबाच्या अंनतमुखी प्रचारयंत्राने प्रतापसिंहाच्या निष्कलंक जीवनाविषयी इंग्लंडच्या जनतेची आणि साऱ्या जागृत जगाची पुरेपर खात्री पटवून दिली. आंग्रेजलोक मतलबासाठी नेकी इमान नि विश्वासाचा मोहजाल पसरण्यात कितीही यशस्वी झाले असले, तरी यापुढे त्यांच्या वचनांवर आणि लेखी आश्वासनांवर विसंबून राहणे धोक्याचे आहे.
अशा कटू अनुभवाने रंगो बापूजीच्या विचारांचा कल उघड बंडाकडे झुकू लागला असल्यास, त्यात आश्चर्य मानण्याचे कारण नाही. तशात झीलसाहेबाच्या मृत्यूने त्याला इतका विलक्षण धक्का बसला की त्याने कारीला परत येतांच थोडयाच दिवसांनी, शिवाजी नि दादजी नरस प्रभू यांनी स्वराज्याची आणभाक केलेल्या, राईरेश्वराच्या देवळाला भेट देऊन, त्या स्वयंभू शंकराच्या पिंडीवर आपली लेखणी, कलदान आणि पागोटे वाहून त्यांचा आमरण त्याग केला. यापुढे त्याने कोणालाही कसल्याही बाबतीत एक चिठोरेही कधी लिहिले नाही. तसेच त्याने स्मश्रू न करता दादी नि डोक्यावरचे केस वाढविण्यास सुरुवात केली. या उपक्रमाबद्दल घरातल्या मंडळीनी विचारले असता, ``कायदेबाजीने अंग्रेजाशी झगडा देणारा रंगोबा आता मेला, यावरून काय ते उमजा." एवढेच उत्तर दिले.
देशातली जनता राज्यकर्त्यांविरुद्ध एकमुखी नि एकदिली खवळून उठली, तर ते राज्य नि राज्यकर्ते तेव्हाच रसातळाला जातात, हा अनुभव नि देखावा त्याने लंडनात घेतला होता नि पाहिलाही होता, पण हे हिंदुस्थानासारख्या धर्मभेद, जातिभेद, प्रांतभेद इत्यादी अनंत भेदानी भेदरलेल्या देशात शक्य आहे की नाही. याचा निर्णय त्याला एकाकी घेता येई ना. काशीकर मंडळी साताऱ्याला सुखरूप येऊन दाखल झाल्यावर, त्यांना भेटण्यासाठी रंगोबा आल्याचे मागील प्रकरणात सांगितलेच. तेथून तो जो परत फिरला तो सन १८५५च्या अखेरपर्यन्त बेपत्ता होता. कोठे गेला याचा घरच्या मंडळीनाही थांग लागला नाही. अर्थात मागाहून तो खुलासा झाल्यावरूनच पुढला मजकूर लिहिण्याचे साहित्य हस्तगत झाले. हा तपशीलवार खुलासा सन १९२३ साली कै. गोविंद गोपाळ टिपणीस महाडकर यांनी रंगो बापूजीचे वृद्ध पुतणे कै. वामनराव देशपांडे यांना आतोणे येथे मुद्दाम भेटून मिळविला. वामनराव नि त्यांचे थोरले बंधू यशवंतराव दोघेही चुलत्याच्या आज्ञेवरून उत्तर हिंदुस्थानात मावळातले पांचशे लढवय्ये घेऊन गेले होते. सप्टेंबर १८५७च्या दिल्लीच्या अखेरच्या हातघाईच्या लढाईत त्यांनी भाग घेतलेला होता. अंग्रेजांची सरशी झाली आणि त्यांनी शत्रूकडील जखमी अथवा मेलेले असा काहीच भेद न करता, युद्धभूमीवर पडलेल्या जित्या मेल्या सर्व सैनिकांची मुंडकी एका बाजूला आणि धडे एका बाजूला अशा मोठ्या राशी रचण्याचा धडाका चालू केला.
हे दोघेही बंधू घायाळ होऊन समरांगणावर पडले होते. किंचित शुद्धीवर येऊन पहातात, तो जित्या मेल्यांची मुंडकी छाटण्याचा कसायीखाना दिसला. वामनरावाने मोठ्या सावधगिरीने आपल्या भावाचा रांगत फरपटत शोध केला आणि दोघेही धडांच्या राशीत डोकी दडऊन प्रेतासारखे पडून राहिले. एक रात्र नि दोन दिवस अशा स्थितीत ते पडून होते. नंतर मध्यरात्रीच्या सामसुमीचा फायदा घेऊन ते तेथून निसटले आणि गोसाव्याच्या वेषांतराने कोकणात आले. राणीचा माफीचा जाहीरनामा बाहेर पडेपर्यन्त ते आतोण्याच्या जंगलात कंदमुळे खात लपूनछपून रहात होते.
रंगो बापूजीने कलम, कलमदान नि पागोटे राईरेश्वराला अर्पण करून, एक प्रकारचा सन्यासच घेतला. त्याचा घरच्या मंडळीवर इतका परिणाम झाला कीं रंगोबाचा कर्तासवरता पुत्र सीताराम आणि हे दोघे पुतणे यांनी भाऊकाका हाती घेईल त्या धाडसात पणाला प्राण लाऊन उड्या घेण्याच्या प्रतिज्ञा केल्या. त्या तिघांनीही कशा पार पाडल्या, हे आपण पुढे पाहू.
लंडनहून रंगोबा परत येताच काशीला गेला. तेव्हा नानासाहेबाच्या अजिमुल्ला त्याला भेटायला मुद्दाम काशीला आला होता. दोघांची बरीच बोलणी झाली. अजिमुल्लाचे लंडनातले रंगेल चरित्र रंगोबाच्या स्मरणात ताजेच होते. म्हणून त्याच्या तोंडी निमंत्रणावरून बिथूरला नानासाहेबाला भेटण्याचे त्याने स्पष्ट नाकारले. रंगोबाचा मुक्काम मुंबईला असतानाच (१३-३-१८५४ रोजी) नागपूर खालसा केल्याचे त्याला समजले होते. इतकेच नव्हे तर अगदी नेमक्या त्याच दिवशी (१३-३-१८५४) झांशीचेही राज्य आंग्रेजांनी घशात टाकल्याची बातमी सगळीकडे फैलावलेली होती. देशी राज्ये भराभर मटकावण्याचा अंग्रेजानी धूमधडाका चालविलेला आहे. तेव्हा सातारच्या काशीकर मंडळींना कबूल केलेली नेमणूक त्यांच्या पदरात पडून, ते सारे सातारला, आपल्या मायभूमीला, सुखरूप जाऊन पोहोचले, म्हणजे मिळवली, या विवंचनेत रंगो बापूजी असल्यामुळे, त्याला नानासाहेब किंवा इतर पदभ्रष्टांच्या अडचणींचा विचार करण्याइतका उसंतच नव्हता.
१८५४ च्या जुलै अखेरपासून तो १८५५ च्या डिसेंबरअखेरपर्यन्त रंगोबाने जो अज्ञातवासाचा उत्तर हिंदुस्थानाचा दौरा केला, तेव्हा मात्र त्याने ठिकठिकाणच्या प्रक्षुब्ध लोकमताचा आढावा घेतला. अंग्रेजांविरुद्ध तमाम उत्तर हिंदुस्थान जळफळत आहे खरे, पण या प्रक्षोभाला शिस्तवार कह्यात ठेऊन, त्याची पद्धतशीर संघटना करणार कोण आणि त्या संघटनेचे कदरबाज नेतृत्त्व पत्करणार कोण? हा महत्त्वाचा प्रश्न मात्र त्याला या दौऱ्यात नीटसा सुटला नाही. लंडनातल्या प्रदीर्घ वास्तव्यामुळे, आंग्रेजाच्या सर्वांगीण कदरबाज शिस्तीचा त्याने पूर्ण अनुभव घेतला होता. नुसत्या हुल्लडबाज उठावणीच्या बंडाळीवर त्याचा भरंसा नव्हता. कानपूर येथे रामदासी गोसाव्याच्या वेषात भटकत असताना, तात्या टोपीची नि रंगोबाची गाठ पडली. तात्याने बिथूरला तातडीचा हलकारा पाठवून, रंगोबा आल्याचे नानासाहेबांना कळविले.
नानासाहेब स्वत: येऊन रंगोबाला बिथूरला घेऊन गेले. “पूर्वीचे झाले गेले विसरून, सध्या एकाच नावेत आपण आहोत याचा विचार करावा आणि भविष्योत्तर दाखवावे", अशी नानासाहेबाने विनंती केली. दोनतीन दिवस अखंड गुप्त बैठक्या चालल्या होत्या. "आंग्रेजांशी तोंडातोंडी नि लेखालेखीची भांडणे लढविण्यात आता अर्थच उरला नाही. काशी ते रामेश्वर तमाम हिंदुस्थान एकदिली उठेल तरच निभाव. नाहीपेक्षा त्यात अर्थ नाही. शिवाय, तशा उठावणीचा यत्न झालाच, तर त्या उठावाचा सेनापती कोण?" अशी पृच्छा रंगोबाने नानासाहेबापुढे टाकली. नानासाहेबाचा या घटकेला काही कसलाच निश्चय ठाम ठरलेला नव्हता. तरीही तशीच वेळ आली तर उत्तर हिंदुस्थानातले आम्ही सारे दखनी संस्थानिक आणि लोक पेशवाईच्या पुनर्घटनेसाठी प्राणाचीही तमा बाळगणार नाही, एवढा संकेत मात्र या बैठकीत स्पष्ट झाला. म्हणजे सारांश काय? दिल्लीचा बादशहा स्वत:च्या बादशाहीसाठी झुरतो, पंजाबवाले शीख रणजितसिंगाच्या नावाने रडताहेत, लखनौचे नवाब आपल्या नशिबाचा शोध घेताहेत, झांशीवाले आपल्या संस्थानापुरते धडपडताहेत आणि हे ब्रम्हावर्ताचे धोंडोपंत पुण्याच्या पेशवाईच्या पुनर्घटनेची स्वप्ने पहात आहेत!
रथतलोकांकडे पहावे तर कुछभी होने दो, हम फिरंगीका खातमा कर डालना मंगता है, एवढ्यापुरताच आवेश! आणि या हजार ठिकाणी धुमसत असलेल्या ज्वालामुखीला एकलगामी लावणारा जातिवंत असामी कोणीच नाही. समजा, आम्ही उठावणी केली तर तुमची आम्हाला काय मदत मिळणार? असा नानासाहेबाने रंगोबाला सवाल टाकताच, त्याने "माझ्या मावळातला हजार गडी नि माझे दोन पुतणे, तुमचा निरोप येताच, इकडे रवाना करतो. उत्तरेकडे पंचारतीचा गजर झालेला ऐकू येताच, दक्षिणेत मी नौबदीवर टिपरी हाणतो", असे आश्वासन दिले.
१८५५ च्या अखेरीला रंगोबा आपली रामदासी काशीयात्रा पुरी करून दक्षिणेत आला. उलटसुलट विचारांच्या खळबळाटाने दीडदोन महिने तो अगदी अस्वस्थ होता. इतक्यात ७-२-१८५६ रोजी अयोध्येचे राज्य खालसा केल्याची बातमी आली. अयोध्येच्या बेगमांचाही अनन्वित छळ झाल्याच्या भयंकर बातम्या सगळीकडे फैलावल्या. लखनौला लागलेले ग्रहणाचे वेध पुरे होऊन तेथेही खग्रास झाले. पुन्हा एकदा रंगोबा घराबाहेर पडला. मात्र या वेळी तो कोठकोठे जाणार नि काय करणार, याचे बातबेत सीताराम, यशवंतराव नि वामनराव यांना गुप्त सांगून बाहेर पडला. त्यांनाही तयारीत राहण्याची आज्ञा दिली.
दक्षिणेतली बामणी पटवर्धनी संस्थाने आधीच कुंफणी सरकारच्या पुरी कच्छपी लागलेली. तशात सातारच्या स्वराज्याच्या खुनात त्यांनी पुढारपणाने भाग घेतलेला. बाळाजीपंत नातू जरी मेला होता, तरी त्याचे इमानी सांप्रदायिक गावोगाव धडधाकड़ जिवंत होते आणि सातारच्या राजकुटुंबाची दैना पाहून, "आमच्या श्रीमंतांना खाड्यात घालायला गेले नि अखेर त्याच खाड्यात आपण गारद झाले", असे उघडपणाने बोलायलाही ते कचरत नसत. स्वराज्य गेले तरी बामणांचा बामणेतरांविषयी द्वेष रतिमात्र कमी झाला नाही. उलट, आंग्रेजांच्या पाठबळावर तो सारखा वाढीला लागलेला होता. शिवाय छत्रपति नि पेशवे जरी धुळीचे दिवे फुंकीत गेले, तरी अंग्रेजांच्या कृपेने या भटी संस्थानिकांची संस्थाने ठाकठीक थाटात चाललेली होती. अशा आंग्लाळलेल्या दक्षिणी संस्थानिक भटांना राज्यक्रांतीच्या कल्पनेचा नुसता वास येताच, तिची भ्रूणहत्या करायला तात्काळ ते मायबाप पोलिटिकल एजंटाच्या कानाचा चावा घेतल्याशिवाय रहाणार नाहीत. या धोक्याची जाणीव ठेवून रंगो बापूजी आपल्या प्रयत्नांची पावले फार सावधपणाने नि जपून टाकीत होता.
छत्रपतीचे नाव काढताच, सक्षौर सचैल स्नान करण्याइतका पटवर्धनी संस्थानांचा आणि बामणांचा द्वेष जागता असला, तरी महाराष्ट्रातला मराठा शेतकरी बहुजनसमाज, छत्रपतीच्या नावासाठी आजही आपल्या जिवाची कुरवंडी केल्याशिवाय रहाणार नाही, या धोरणाने, रंगो बापूजीने, उमाजी नायकाच्या वेळचे मावळे, रामोशी, कातकरी, कोळी, भंडारी आपल्या गुप्त संघटनेत सामील करून घेतले. दऱ्याखोऱ्यांतले गडकरी किल्लेदार आणि जागोजागचे छोटे जहागीरदार इनामदार त्याने आपल्या सूत्रात बांधून घेतले. सातारा, भोर, रत्नागिरी, मावळप्रांत, विजापूर, पंढरपूर, बेळगांव, कोल्हापूर एवढ्या भागांत त्याने कडेकोट संघटना करून, सीतारामला त्यावर देखरेखीला ठेवला. धोंडोपंत नानासाहेबाचे गुप्त हेर अनेक वेषांतरानी दक्षिणेत येऊ लागले, तरी त्यांनाही या संघटनेचा त्याने सुगावा लागू दिला नाही.
या गुप्त हेरांनी नानासाहेबाच्या पेशवाई पुनर्घटनेच्या योजनेच्या मसलतीने पटवर्धनी संस्थानाना घेरण्याचा खूप तंगङझाड़ यत्न केला. पण, `उत्तर हिंदुस्थानातल्या भानगडीशी आम्हाला काही कर्तव्य नाही, पुन्हा आमच्या राज्यात पाऊल ठेवू नका`, अशा वाटाण्याच्या अक्षता पदरात बांधून त्यांना बाहेर पडावे लागले. या संस्थानिकांचा तळीराम गार झालेला होता. ते कशाला बंडाच्या नसत्या उपद्व्यापांत पडतील? बाजीराव गादीवर असतानाच जे कुंफणी सरकारच्या बगलेत घुसले, त्यांना पेशवाई पुनर्घटनेची कल्पना कितीशी गोड वाटणार? अणि समजा, अगदी अशक्य शक्य झाले नि पटवर्धन मंडळी पेशवाईच्या पुनर्घटनेसाठी नानासाहेबाला पाठिंबा द्यायला उठली असती, तरी त्यांना काहीही करता आले नसते, इतके त्यांचे हातपाय पोलिटिकल एजंटाच्या जोत्याच्या लोखंडी कडीला तहनाम्याच्या साखळदंडाने जाम जखडून टाकलेले होते. पेशवाईच्या महामारीने उजाड नि उद्ध्वस्थ झालेली कुटुंबे महाराष्ट्रात लाखानी मोजण्याइतकी असल्यामुळे, तिच्या पुनर्घटनेचा नुसता शब्द उच्चारणाराची जीभ टाळ्यात रहाणेच शक्य नव्हते, तर तिच्या नावाने क्रांतिकारक संघटनेची यातायात कोण महामूर्ख करणार?
उत्तरेकडे फिरंग्यांचा काटा काढण्यासाठी-प्रत्येकाचे हेतू कोणतेही असले तरी-हिंदू आणि मुसलमान एकजीव नि एकजिव्ह एकवटले होते, तरी असल्या राज्यक्रांतीच्या कोणत्याही नुसत्या कल्पनेला या योजनेला दक्षिणेत मोठी आपत्ती म्हणजे बामणांचा एकमुखी विरोध. या विरोधाने छत्रपतीचे तक्त सिंहासन धुळीला मिळवले आणि फिरंगी बोका घरात घेतला. आता त्याच बोक्याला बाहेर हुसकावून लावायचे तर भटांच्या या विरोध सर्पाला जराही धक्का न लावता रंगो बापूजीला आपली संघटना करायची होती.
छत्रपतीच्या गादीवर बसलेल्या व्यक्तीविषयी बामणेतर बहुजनसमाजांचे काहीही बरे वाईट अनुभव वा समज असले, तरी छत्रपतीच्या गादीविषयी त्यांचा आदरभाव, ती गादी नष्ट झाली तरी नष्ट होणारा नव्हता नि आजही तो आलेला नाही. छत्रपतीची राजगादी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणी जीवनाचा प्राण. तो प्राणच आंग्रेजांनी घेतल्यामुळे, आंग्रेजांच्या प्राणावर घाव घालण्यासाठी हजारो मावळे, रामोशी, कोळी, कातकरी, भंडारी, कोंगाडी श्रमजीवी लोक, आपापल्या भरवशाच्या म्होरक्याला पुढे घालून रंगो बापूजीच्या संघटनेत सामील झाले. मावळातले अनेक कायस्थ प्रभू देशपांडे, फार काय पण स्वत: भोरचा पंत सचीव चिमणाजी रघुनाथ, रंगरूट भरतीच्या कामी रात्रंदिवस खस्ता खात होते. स्वत: रंगो बापूजी गोसाव्याच्या वेषाने, आता या ठिकाणी तर लगेच त्या ठिकाणी घोड्यावर बसून भराऱ्या मारीत होता. उत्तर हिंदुस्थानातून त्याच्या बरोबर आलेले सहा कानफाटे हत्यारबंद घोडेस्वार गोसावी त्यांचे शागीर्द म्हणून बरोबर असत.
ही सारी संघटना पैशाच्या भरपूर पाठबळाशिवाय थोडीच रंग रूपाला येणारी होती? सातारच्या दोनीही राजकटुंबांचा या कामी रंगोबाला पूर्ण पाठिंबा होता. आधीच सातारा पुणे मावळ प्रांतांत रंगोबाचा दरारा मोठा कडवा असे आणि त्यात त्याच्या विलायतेतल्या चवदा वर्षांच्या एकनिष्ठ तपश्चर्येचा जनतेच्या मनावर एवढा खोल परिणाम झालेला होता की ते त्याला अगदी देवासमान मान देत असत. सातारच्या राजकुटुंबांनाही आता अखेरचा त्राता तोच, हे सपशेल मान्य करून, त्याच्या तंत्राने हव्या त्या धाडसाच्या खाईत उडी घ्यायला ती तयार होती. प्रतापसिंहाच्या राणी राजसबाईने कठोर परिस्थितीचे उन्हाळे पावसाळे काशीला अनुभवले होतेच. छत्रपतींच्या उद्ध्वस्त झालेल्या तक्तासाठी, उतार वयात, निराश न होता, हिंमतीने श्रमसाहस करणाऱ्या रंगो बापूजीविषयी तिला फार आदर वाटायचा. एवीतेवी राज्यपदाला सपशेल मुकून साध्यासुध्या रयतेच्या पंक्तीला येऊन आम्ही बसलो, तर रयतेच्या खांद्याला खांदा, भिडवूनच होईल तो सोक्षमोक्ष पत्करावा, अशी राजसबाईची कडेलोटाची विचारसरणी बनलेली होती.
रंगो बापूजीचे प्रतिष्ठित हेर नाशिक त्रिंबकेश्वरापासून तो बंगलोर तंजावरापर्यन्त त्याच्या योजनेला पाठबळ मिळविण्यासाठी हिंडत होते. कोल्हापूरचा बाबासाहेब छत्रपती आंग्रेजी राजकारणाच्या जाळ्यात धडपडत होता, तरी एकाकी एकादे मोक्षसाधनाचे धाडस करण्याइतकी त्याच्या मनाची तयारी नव्हती. परंतु त्याचा सावत्र भाऊ चिमासाहेब याने मात्र रंगो बापूजीच्या योजनेला संपूर्ण उत्तेजन दिले. हत्यारे, दारूगोळा, पैसा यांचा तर त्याने पुरवठा केलाच, पण कोल्हापूर, बेळगांव नि धारवाड येथील कंपनीच्या देशी शिपायांच्या पलटणीत उठावाचे काम त्याने जातीने हाती घेतले. खुद्द सातारचा पोलीस फौजदार अंताजी राजे ऊर्फ बाबासाहेब शिर्के रंगोबाच्या संघटनेत आपणहून सामील झाला. भोरापासून खानापुरापर्यन्त या संघटनेचा कारभार प्रस्थापित सरकाराप्रमाणे परंतु गुप्तपणाने बिनधोक चालला होता आणि रयतेपासून करभारही वसूल केला जात होता. रंगो बापूजीने आपले मुख्य ठाणे परळीच्या आसपास ठेवले होते.
सातारा जिल्ह्यातील वाळवे हे मुख्य केन्द्राचे ठिकाण असून, येथून सगळी सूत्रे पद्धतशीर हालविली जात होती आणि शत्रूपक्षाच्या रहदारीवर टेहळणी ठेवली जात होती. जागोजाग मोक्याच्या ठिकाणी हत्यारे, बंदुका, भाले, बर्च्या, दारूगोळा यांची कोठारे तयार होती. हजारो मावळे, रामोशी, कातकरी, कोळी, भंडारी आपापल्या म्होरक्यांसह ठिकठिकाणी इषाऱ्याची वाट पहात सज्ज होते. संघटनेचा व्याप जसजसा वाढत चालला, तसतसे कंपनी सरकारचे अधिकारीही साशंकतेने वस्तुस्थिती पाहणी करू लागले. औंध, सांगली, मिरजवाले संस्थानिक जागे होऊन चुळबुळ करू लागले. "आमच्या भानगडीत पडाल, कंपनी सरकारला काही कळवाल, तर आंग्रेज बाजूला ठेऊन, आधी तुमचा चेन्दामेन्दा करू, हे लक्षात ठेवा", असा संघटनेच्या सुभेदारांनी प्रत्यक्ष धाक घातल्यामुळे, ते सारे भटजी मुकाट्याने तोंड दाबून गप्प बसले. मुंबईच्या देशी पलटणीच्या उठावासाठीही रंगो बापूजीचे हेर खुद्द मुंबईत बसून खटपट करीत होते.
या सुमारास युरोपात आंग्रेज रशियाचे युद्ध जुंपले होते. हिंदुस्थानात उठाव करण्याची हीच वेळ, असा इषारा रंगोबाने धोंडोपंत नानासाहेबाला खास हेर पाठवून दिला. त्याचा उलट संदेश येताच रंगोबाने आपल्या दोन पुतणांच्या पुढारपणाखाली ५०० लोकांची एक टोळी ब्रम्हावर्ताला रवाना केली. हे सारे लोक निरनिराळ्या वेषाने, थोडथोड्या लोकांच्या टोळ्यांनी चालते झाले. "उत्तर हिंदुस्थानात नानासाहेबाने अथवा आणखी कोणी वजनदार पुढाऱ्याने पुढाकार घेऊन बंडाचा शिस्तबाज उठावा केला, का लगेच आम्ही इकडे बंगलोर बेळगांवापासून तो थेट खोपोली घाटाच्या पायथ्यापर्यन्त आणि कुलाब्यापासून तो थेट वेंगुर्ल्यापर्यन्त समुद्रकिनाऱ्यावर या मऱ्हाठदेशातून आंग्रेजाचा काटा काढतो. त्यांना प्रत्यक्षाप्रत्यक्ष सामील असणाऱ्या देशी लोकांचीही खांडोळी करतो. मात्र चारी बाजूंनी एकदम उठाव होईल अशी काळजी घ्या. उठावाची सगळी सूत्रे एकाहाती ठेवा`, असा निरोप रंगोबाने आपल्या वामनराव पुतण्याबरोबर नानासाहेबाला दिला होता. अजिमुल्लाविषयी मात्र रंगोबाला कसलीच खात्री वाटत नव्हती. त्याच्या सर्वस्वी आहारी न जाता, तात्या टोपेला विश्वासात घेऊन निश्चयाने पुढे पाऊल टाकावे, असाही खास इषारा दिला होता. पण तो व्यर्थ गेला. बिथूरला अजिमुल्लाशिवाय नानासाहेबाचे पान हालत नसे आणि तात्या टोपे बिचारा अगदी बाजूला पडलेला होता. (अखेर या छंगीफंगी अजिमुल्लानेच बिबि घरात इंग्रज बायका मुलाची खाटकी कत्तल करून, नानासाहेबाच्या लौकिकी वजनाचे नि अब्रूचे निखारे केले.)
या प्रकरणात उत्तरेकडील किंवा दक्षिणेकडील उठावांचा तपशील न देता, रंगो बापूजीच्या चरित्रापुरताच त्यांचा संदर्भ दाखवायचा आहे. ६ एप्रिल १८५७ रोजी झालेल्या मंगळ पांड्याच्या फाशीची बातमी दक्षिणेत येताच, सारा महाराष्ट्र हादरला. पाठोपाठ १० मे रोजी मिरजच्या उठावाच्या बातमीने तर रंगो बापूजीच्या ठिकठिकाणच्या सैन्यात उठावणीची आतुरता खळबळाट करू लागली. ४ जूनचा कानपूरचा दंगा झाल्याची बातमी येताच, साताऱ्याच्या आसपासच्या रंगोबाच्या लोकांनी परळीजवळ एक मोठा दरोडा घालून दंगल केली. त्याने स्वत: त्या ठिकाणी तातडीने जाऊन, `इषाऱ्यांशिवाय उठावणी कराल तर तोफेच्या तोंडी देईन सगळ्यांना` असा दम भरला. तेथल्या सुभेदारांचीही त्याने कडाडून हजेरी घेतली. कोल्हापूर बेळगांव धारवाड येथल्या पलटणीही अस्वस्थ झाल्या. त्यांना काबूत ठेवण्याच्या कामावर रंगोबाचा मुलगा सीताराम श्रम करीत होता. उत्तर हिंदुस्थानातली बातमी टाकोटाक समजण्यासाठी दर पन्नास मैलावर घोडेस्वारांची डाक रंगोबाने ठेवलेली होती. तो एका विशेष घटनेची वाट पहात होता.
पण इकडे निराळीच आंग्ल-घटना किंवा विधिघटना घडत होती. मुंबई सरकारचे अधिकारी निजलेले नव्हते. त्यांचेही हेर या गुप्त संघटनेच्या बातम्या त्यांना वेळच्या वेळी पुरवीत होते, रंगोबाने आपल्या संघटनेत दक्षिणी ऊर्फ चित्पावन बामणांना कटाक्षाने वगळले होते, तरी भोरचा देशस्थ ब्राह्मण पंत सचिव पूर्वजांच्या नि देवांच्या आणाभाका करून रंगोबाला सामील झाला होता. आणि तसे पाहिले तर त्याने इमानाने संघटनेची कामगिरीही उत्तमच बजावली होती. शंका घ्यायला किंवा यायला जागाच नव्हती. बाळाजीपंत नातूच्या कर्जाच्या फासाने पंतसचीवाचे घराणे अगदी बेजार झालेले होते. आंग्रेजांपाशीही त्याची काही किंमत उरली नव्हती. जहागिरीचा बराचसा भाग कर्जाच्या फेडीसाठी अंग्रेजांनी तोडून घेतलेला होता.
या वैतागाने तो रंगो बापूजीच्या संघटनेत आपणहून आला होता. मुंबईच्या दूरदृष्टी अधिकाऱ्यांनी पंत सचिवाला भरंसाद वचने देऊन आपल्या बाजूला खेचला. कंपनीच्या लांचलुचपतीला गबाळ्या देशस्थ भटजी बळी पडला. पंतानी रंगो बापूजीच्या कंटातला कृष्णाजी सदाशिव शिंदकर या नावाचा एक कायस्थ प्रभू गृहस्थ आपला नि कंपनीचा हेर म्हणून तयार केला. रंगो बापूजीच्या सर्व हालचाली हाच सचिवामार्फत पुण्याच्या अधिकाऱ्यांना कळवीत होता. वास्तविक या शिंदकरानेच बिथूरला पाठविण्याच्या जादा ५०० लोकांची स्वत: हमी घेतली होती. तो वरवर मात्र रंगोबाच्या मावळ संघटनेतला उजवा हात म्हणूनच वागत होता. खुद्द पंतसचिवसुद्धा बंडाच्या कटात तनमनधनावर तुळशीपत्र ठेवल्या इतका रंगो बापूजीला सामील असल्याचा बहाणा करीत होता. माझे मित्र श्री. गोपीनाथराव बाळकृष्ण पोतनवीस उरवडेकर यांच्या जुन्या दप्तराच्या गळाठ्यात सापडलेली तीन अस्सल पत्रेच या विधानाची सत्यता पटवतात. ही पत्रे चिमणाजी रघुनाथ सचीव याने रंगो बापूजीला जरी लिहिलेली आहेत, तरी पाकिटावर मात्र -
चिरंजीव राजश्री कृष्णराव सदासीव सिंदकर
मु॥ कसबे भोर येथे दीजे रवाना माहाडाहून
असा पत्ता लिहिलेला आहे. यावरून तोंडी किंवा पत्राद्वारे पंतसचिव रंगोबाला ज्या हुलकावण्या देत होता, त्या सर्व कृष्णराव शिंदकराच्या मार्फत होत, यात मुळीच संशय रहात नाही.
चिमणाजी रघुनाथ सचिव याची तीन अस्सल पत्रे.
(१) श्रीरामचंद्र
राजश्री रंगोबा बापूजी विशष आपले व आमचे भोर मु. बोलणे जाले त्या प्रो. आम्हांकडून तजवीज करून मागाऊन चिटी पाठवितो. तिकडील आपण तजवीज करावी. ७ जून सन १८५७ इ||
- चिमणाजी रघुनाथ सचिव.
(२) श्रीरामचंद्र
राजश्री रंगो बापूजी विशेष आपण ऐ(व) जाविसी तजवीज करावी म्हणोन लिहिले. त्यास आपल्या लि।। प्रो. तजवीज करून पाठवितो.
ता. ९ जून सन १८५७ इ।।.
- चिमणा रघुनाथ सचिव
(३) श्रीरामचंद्र
राजश्री रंगोबा बापूजी विशेष आपण ता. १५ जूनची सर्व कामाबद्दल तजवीज ठेवली म्हणोन लिहिले ते समजले. त्या प्रो. आपण करून मग इकडू(न) सर्व संकेताप्रो आम्ही करू आणि आम्ही तुमचे शब्दाबाहेर नाही. या प्रो. माहाराज यासी सांगावे. आनमान करू नये.
ता. १० जून, सन १८५७ इ।।
- चिमणा रघुनाथ सचिव
घाटमाथा, कोकण, समुद्रकिनारा तो नासिक नि बेळगाव कोल्हापूर, धारवाड पर्यन्त ठरावीक दिवशी उठावणीची व्यवस्था शिस्तवार लावून, मावळातले जादा ५०० सैनिक दिल्लीकडे रवाना करण्यासाठी रंगो बापूजी शिंदकराला भेटण्यासाठी शिंदाला गेला. ठरावीक संकेताच्या जागी भेटायला यावे, असा रंगोबाने त्याला निरोप पाठविला. `मी हिंवतापाने आजारी आहे, तुम्हीच मला येऊन घरी भेटा`, असे कळविताच, रंगोबा त्याच्या घरी गेला. ही भेट कंपनी सरकार, सचिव नि शिंदकर यांनी फारच कुशलतेने जमवून आणलेली होती.
रंगोबा- कायरे, उठावाची तारीख जवळ आली आणि तू तर असा बिछान्यात?
शिंदकर - (कण्हत कण्हत) काय करू. हिवतापाने जीव खाल्ला. होताहेत थोडथोडे लोक रवाना. बरं, पण कशी काय व्यवस्था लावलीस? कोण कोण राजेरजवाडे आपल्याला सामील झाले? उठावणीचे बातमेत कसे काय ठरले? ते तरी सांग. बाबा मला. शिवाजीचे नाव घेऊन एकदा हरहर महादेव केलाच पाहिजे.
(रंगो बापूजी खिशातून कागद काढून सर्वांची नावे वाचून दाखवतो व इतरही माहिती देतो.)
शिंदकर – वा! फार छान शिस्त लावलीस. (हुश्श हुश्श करीत) फार छान शिस्त लावलीस. सारखी आंगाची आग होत आहे. रंगोबा, या खोलीचा तो दरवाजा तरी उघड, म्हणजे वारा तरी आत येईल.
रंगोबा उठला नि त्याने कडी काढून दरवाजा उघडताच, त्या खोलीत आधीच आणून ठेवलेले गोरे सोजीर एकदम बाहेर पडले आणि त्यांनी रंगो बापूजीवर झडप घालून त्याला पकडले. कंपनीचे कारस्थान यशस्वी झाले. हातापायांत बेड्या पडून बंदिस्त झालेला रंगो बापूजी शिंदकराला उद्देशून त्वेषाने म्हणाला. "बुवा शिंदकर, हेच का तुला अखेर साधायचे होते? ठीक केलेस. मी तर मरणालाच मिठी मारून उद्योग केला. पण हरामखोरा, आज तू मला फासावर चढवीत नसून माझ्या महाराष्ट्र मायभूमीचा तू गळा कापीत आहेस. ईश्वर तुझा सत्यानाश करील. आज तू जातीच्या नावाला काळीमा लावलास. तुझा निर्वंश होईल.``
रंगोबाला पकडून दिल्याबद्दल भोरच्या पंत सचिवाची कंपनी सरकारात फार मोठी वहावा झाली. त्याला अनेक सवलती सन्मानाने देण्यात आल्या. आप्पा शिंदकराच्याच कुळातल्या या बुवा शिंदकराला काही गावांची वंशपरंपरा इनामदारी नि शिवाय विश्वासराव हा किताब मिळाला.
दादजी नरस प्रभूचे वतन शंकराजी नारायण सचिवाने गिळंकृत करून त्याला भिकेला लावले. अखेर चिमणाजी रघुनाथ सचिवाने रंगो बापूजीला पकडून देण्याचे महापराक्रमी शौर्य गाजविले. सारांश काय? तर रंगो बापूजीच्या घराण्याला भोरच्या पंत सचिवाचा शनि जो एकदा चिकटला तो अव्वल अखेर त्याला भोवला! इतिहासाच्या पुनरावृत्तीचे तत्त्व म्हणजे काही अगदी काल्पनिक कांदबरी नव्हे.
दक्षिणेतल्या उठावाचा मुख्य सूत्रधारच वैऱ्यांच्या सापळ्यात सापडल्यावर पुढे १० ऑगष्टला ठरलेली परंतु काही आकस्मिक कारणांनी ३१ जुलैलाच झालेली उठावणी आंग्रेजांनी जागोजाग सफाईत चेचून ठेचून काढली. रंगोबाचा मुलगा सीताराम, बेळगावच्या शिपायांचा पुढारी ठाकुरसिंग, मुनशी सांवतवाडीचा रामजी शिरसाळ वगैरे आठरा पुढारी मंडळी आंग्रेजांनी पकडून सातारच्या गेंड्याच्या माळावर धडाधड फाशी दिली. कोल्हापूरच्या चिमासाहेब भोसल्याला कराचीला हद्दपार केले. प्रतापसिंहाचा दत्तकपुत्र शाहु ऊर्फ जंगली महाराज, त्याचा चुलता काकासाहेब, राजसबाई, गुणवंताबाई हिचा दत्तकपुत्र दुर्गासिंग या सगळ्यांना मुंबई सरकारने मुंबईला नेऊन बुचर बेटावर अलग अलग अटकेत ठेवले.
तेथून त्यांना १८५८ च्या मार्चात कराचीला नेऊन ठेवले. एकमेकांच्या भेटी होऊ दिल्या नाहीत. आप्पासाहेबाचा दत्तकपुत्र व्यंकाजी याला प्रथम अहमदाबादला आणि नंतर अहमदनगरला ठेवले. तेथेच तो १८६४ साली मरण पावला. १८५७ च्या बखेड्यानंतर या सर्व मंडळींचा मासिक तनखा अवघे रुपये ३८० होता. जंगली महाराजाला १८८५ च्या जुलईत मुक्त केले. तेव्हा तो पुण्यात भवानी पेठेत घर नं. ५४३ येथे येऊन राहिला आणि तेथेच १ जून १८९२ साली मरण पावला. त्याने ब्रम्हो समाजाची दीक्षा घेतली होती, म्हणून त्याचा त्या पंथानुसार अंत्यविधी झाला. भवानी पेठेत त्याची समाधी पहाण्यासारखी आहे.
आप्पासाहेबाचा दत्तक पुत्र व्यंकाजी १८६४ साली मृत्यू पावताच, राणी सगुणाबाईने ता. १८-५-१८६५ रोजी राजाराम आबासाहेब यास दत्तक घेतले. सातारचे राज्य परत मिळण्यासाठी सगुणाबाईने तत्कालीन सुप्रसिद्ध कायदेपंडित कै. विश्वनाथ नारायण मंडलीक यांच्याकडून विक्टोरिया महाराणीला एक मोठे मुद्देसुद नि भरपूर पुराव्यांचे एक अपील लिहून घेतले. त्याचा ५०० पानांचा एक मोठा छापील ग्रंथच आहे. त्यात छत्रपतींच्या हक्कांचे भरपूर विवेचन असून, शेकडो जुने कागदपत्र आणि मोठमोठ्या इंग्रेज मुत्सद्यांची पार्लमेण्टातली भाषणे अभिप्राय वगैरे ऐतिहासिक महत्त्वाचा पुष्कळ संग्रह आहे. अर्ज रवाना केल्यानंतर अवघ्या दहाच दिवसांनी (ता. २४-३-१८७४ रोजी) सगुणाबाई मरण पावली.
राजाराम आबासाहेबाला दोन पुत्र. एक शिवाजी ऊर्फ अण्णासाहेब आणि दुसरा प्रतापसिंह ऊर्फ भाऊसाहेब. पैकी अण्णासाहेब १९१४ साली आणि भाऊसाहेब १९२५ साली निपुत्रिक मरण पावले. भाऊसाहेबाची बायको ताराबाई हिने शेडगांवकर भोसले घराण्यातला एक मुलगा दत्तक घेऊन त्याचे नाव शाहूराजे असे ठेवले. (दत्तविधान ता. २८ मे १९२५). भोसले छत्रपतीच्या वंशाचे नाव सध्या हाच तरुण चालवीत आहे. या दत्तविधानाच्या निमित्ताने प्रबोधनात लिहिलेला `सातारचे दैव नि दैवाचा सतारा` हा माझा अग्रलेख हजारो स्वतंत्र पुस्तिकेच्या प्रसाराने पुष्कळांच्या स्मरणात असेलच.
रंगो बापूजीला पकडल्यावर प्रथम त्याला रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवला. स्वदेशातच हा खेळ्या आदमी ठेवला तर तुरूंगातही हा काही खेळ खेळायचा, म्हणून मुंबई सरकारने त्याला ग्वालेरीच्या तुरुंगात पाठवून, गोऱ्या सोजरांचा बागनेटी पहारा ठेवला. इकडे रंगो बापूजीचे जेवढे म्हणून नजीक दूरचे नातेवाईक सापडले, त्या सर्वांना सरकारने फासावर दिले. त्यामुळे तमाम कायस्थ प्रभू समाजात भयंकर अस्वस्थता उत्पन्न झाली. प्रत्येकाने आपापल्या घरातले रंगो बापूजीचे पत्र, चिठोरे, त्याचे मोडी पुस्तक, जेथे जेथे त्याचा संबंध असेल ती वस्तू जाळून खाक करून टाकली.
रंगो बापूजी साता समुद्राचे पाणी पिऊन आलेला होता. इंग्लिशही फार छान बोलायचा. त्याने थोड्याच दिवसांत पाहरेकरी सोजरांवर आपल्या बहुश्रुतपणाची छाप बसवून, त्यांना आपले दोस्त बनवले. हा कोणीतरी फार मोठा, थोर कुळातला सज्जन, विलायतभर प्रवास करून आलेला, तेथल्या मोठमोठ्या पार्लमेंट मेंबरांचाही जानीदोस्त असा गृहस्थ आहे, ही सोजरांची खात्री पटल्यामुळे, ते त्याला गुन्हेगार कैद्याप्रमाणे न वागवता, नेहमी अगदी आदराने नि खेळीमेळीने वागवू लागले. सकाळ संध्याकाळ रंगोबा त्यांना आपल्या प्रवासातल्या मौजा सांगून त्यांची करमणूक करायचा. अशी मोठी दिल्लगीची दोस्ती जमल्यावर, एका रात्री संधी साधून रंगोबाने ग्वालेरीच्या तुरुंगातून पोबारा केला. जिकडे तिकडे तारा सुटल्या. मुंबई कलकत्ता सरकारे खडबडली. ठिकठिकाणच्या गुप्त पोलिसांच्या सेना शिकारी कुत्र्याप्रमाणे रंगोबाचा वास घेत घेत आसेतूहिमाचल भटकू लागल्या. पण अखेरपर्यन्त तो कोणालाच कधी सापडला नाही. त्याची जन्मतारीख जशी उपलब्ध नाही. तसा त्याचा मृत्यू कोठे कधी कशाने झाला, याचीही माहिती मिळत नाही.
रंगो बापूजी म्हणून डझनभर भलत्याच लोकाना सरकारने पकडून फाशी दिले. प्रेते दाखवल्यावर हा रंगो बापूजी नव्हे, असे त्याच्या ओळखीच्या नि नात्याच्या शिलकी मंडळीनी सांगावे, असा क्रम बरेच दिवस चालला होता. रंगो बापूजीला पकडण्यासाठी त्याच्या तसबिरीची फोटोची प्रत मिळवण्यासाठी एक गोऱ्या सोजरांची पलटण कारीला गेली होती. त्यानी रंगोबाच्या रहात्या घराच्या जमिनी नि भिंती उकरून काढल्या. कागदपत्रांचा नाश केला आणि काही मोलवान विलायती बिजा (त्यातच त्याचे चांदीचे तबक होते) सोजरानी लंबे केल्या. सोजरांचा गराडा येतोसा दिसताच, त्या वेळी दिल्लीहून परत आलेले रंगोबाचे दोघे पुतणे यशवंतराव आणि वामनराव यानी बरोबर हेरले की ही धाड भाऊकाकाच्या तसबिरीसाठीच आलेली असावी.
त्यानी ती तसबीर आंगणातल्या विहिरीतल्या कोनाडयात दडवून वर विटांची टापर ठोकून लपवून ठेवली म्हणून वाचली आणि वामनरावांच्या मेहरबानीने तिचा फोटो कै. प्रो. गोविंदरावजी टिपणीसाना घेता आला. त्या फोटोवरूनच कु. बाळ ठाकरे या माझ्या चित्रकार चिरंजिवाने तयार केलेली प्रतिमा या पुस्तकात जोडण्याचे भाग्य मला लाभत आहे. वाचकानी या प्रतिमेचे दर्शन घेऊन रंगो बापूजीच्या अलौकिक कर्तबगारीचे आता निदान नुसते स्मरण तरी करावे एवढीच विनंती.
गेली तीस वर्षे ज्या चरित्र ग्रंथ लेखनाचा मी ध्यास घेतला होता, तो आज ता. २१ मे सन १९४७ रोजी लिहून पुरा होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. सन १९२१ साली कै. शाहू महाराज छत्रपति करवीरकर याना मुंबई मुकामी दिवाणसाहेब सर सबनीस यांचे समक्ष आणि पुन्हा ५-५-१९२२ ला महाराजांच्या मृत्यूशय्येवर दिलेले वचन आज पुरे होत आहे. आता मात्र आला ग्रंथाचा शेवट असे म्हणता-छे छे, नाही म्हणता येणार! अझून मला वामनराव गुप्ते देशपांडे यांच्या समाधीवर कृतज्ञतेची दोन फुले वहायची आहेत.
राणीचा माफीचा जाहिरनामा फडकल्यावर यशवंतराव नि वामनराव आपला आतोण्याच्या जंगलातला गुप्त वनवास संपवून घरी परत आले. सगळ्याचाच विध्वंस झालेला होता. रंगोबा भाऊकाकाचा तर पत्ताच नव्हता. झाले गेले विसरून, आता या तरुणानी संसारात बसावे म्हणून आजूबाजूच्या मंडळीनी यशवंतरावच्या विवाहाचा प्रश्न काढला. तेव्हा तो मानी तरुण म्हणाला. "अहो, जिथं आमच्या देशाचं लागत असलेलं लगीन दिल्लीला मोडलं, तिथं माझ्या लग्नाची एवढी खटपट कशाला? स्वराज्यासाठी, छत्रपतीसाठी भाऊकाका देशोधडीला लागले, आमचा सीतारामहि मर्दासारखा फासावर चढला. आता स्वराज्यासाठी कोण झगडणार? आम्ही गेलो फुकट! पारतंत्र्यांत वंशवृद्धि करण्यापेक्षा आमच्या देशपांडे गुप्ते घराण्याची नकल झाली तर त्यात वाईट ते काय?"
यशवंतरावने विवाह केला नाही. पुढे काही वर्षांनी तो आसन्नमरण आजारी पडला असता, वामनरावला त्याने आपल्या आजन्म ब्रम्हचर्याची परंपरा पुढे चालविण्याची मृत्युशय्येवर शपथ दिली. के. गोविंदरावजी टिपणीसानी वामनची मुलाखत घेऊन ती मला देताना डोळ्यात आनंदाश्रू आणून ते म्हणाले. "काय सांगू केशवराव तुम्हाला. वामनराव आज अत्यंत वृद्ध नि क्षीण झालेले आहेत. डोळ्यानी दिसत नाही. कानानी विशेष ऐकू येत नाही. पण आपल्या कर्तबगार भाऊकाकाबद्दल ते माहिती देऊ लागले म्हणजे डोळ्यांतून अश्रूंचा प्रवाहसारखा वहात असतानाहि ते इतक्या आवेशात येतात का त्या आसन्नमरण वृद्धातहि लढाऊ मनाचे तारुण्य बेफाम चमकते."
ही हकिकत मार्च १९२६ च्या प्रबोधनात प्रसिद्ध करताना मी लिहिले- "महाराष्ट्राच्या स्वराज्यांसाठी काया वाचा मनें झगडून बदललेल्या परिस्थितीत आता केवळ मृत्यूच्या भेटीची अपेक्षा करणाऱ्या या वृद्ध वीराला आमचे साष्टांग प्रणिपात असोत. महाराष्ट्रात स्वराज्य नाही, हिंदुस्थान स्वतंत्र नाही, म्हणून स्वराज्यसेवक देशपांडे गुप्त्यांचा वंश निष्कारण पुढे जगूच नये, म्हणून आमरण ब्रम्हचर्याची शपथ घेणाऱ्या वामनरावांचा स्वार्थत्याग नि आत्मयज्ञ, आमचे परममित्र गोविंदरावजी टिपणीस यांच्या परिश्रमाने आज अखिल भारताला प्रथमच जाहीर करण्याचा मान प्रबोधनाला मिळत आहे. हे आमचे भाग्यच होय."
या अंकात मी वामनरावजींचा फोटो मुद्दाम छापला होता, पण दुर्दैव काय पहा! प्रबोधनाचा अंक त्यांच्या घरी गेला त्याच्या आधी अवधे आठच दिवस वामनराव या फितुरी महाराष्ट्राला रामराम ठोकून परलोकवासी झाले होते!
१८५७ नंतर रंगो बापूजी बरेच वर्षे अज्ञातवासात जिवंत होता. ठाणे येथील कै. रावबहादुर प्रभाकर विठ्ठल गुप्ते यांच्याशी रंगो बापूजीविषयी चर्चा करीत बसलो असता, त्यानी आपली एक आठवण सांगितली, ती देऊन ही रंगोबाची कहाणी मी पुरी करतो. प्रभाकररावजींचा जन्म २४ आकटोबर १८४९ सालचा. बारावे वर्षी म्हणजे सन १८६१ साली त्यांची ठाणे येथेच मुंज झाली. "पानसुपारी जेवणावळ वगैरे थाट उत्तम उडाला. दिवेलागणीच्या सुमाराला जैन यतीप्रमाणे गुळगुळीत मुंडन केलेला एक मनुष्य मांडवातून सरळ आमच्या ओटीवर आला. त्याला पहाताच आलास? तुझीच आठवण करीत होतो असे आमच्या वडिलानी हलक्या आवाजात म्हटले नि त्याचा हात धरून दोघे माजघरातल्या एका खोलीत गेले. आमची आई तेथे गेली नि तिने त्या मनुष्याच्या पायावर डोके ठेऊन नमस्कार केला, मलाहि तेथे नेऊन तसाच नमस्कार करायला लावले.
त्या मनुष्याने मला जवळ घेतले नि पाठीवरून हात फिरवला. आईने जेवणाचे ताट आणले नि तो जेवू लागला. वडील एकटेच शेजारी बोलत बसले. तास दीडतास झाला असेल नसेल तोच एकदम आमच्या मांडवात दहाबारा गोरी सोजर नि पंचवीस तीस ठाण्याचे पोलीस आले नि भराभर त्यानी आमच्या घराला वेढा दिला. आम्ही सारी मंडळी घाबरलो. वडील बाहेर येऊन त्यानी `हा काय गलबला आहे` म्हणून विचारले. पार्टीचा मुख्य गोरा म्हणाला- दुमारे मकानमे रंगो बापूजी आया है. हमको टलास लेना है. टुम सब आदमी बाजू हटो. घरातल्या मंडळींना मी तसे सांगतो, असे म्हणून वडील आत माजघरात येतात, तोच त्याच्या आंगावरून एक विकेशा विधवा हातात पितळेची तेपली घेऊन बाहेर पडली आणि थेट त्या शिपायी सोजरांच्या आगावरून शिवाल मला व्हा मेल्यानो दूर असे म्हणत पार फणकाऱ्याने निघून गेली, बंडील पाहुण्याच्या खोलीत डोकाऊन पहातात तो तेथे कोणीच नव्हते.
मात्र दांडीवर वाळत घातलेले विधवेचे एक तांबडे लुगडे तेवढे गेलेले. वडील तसेच परतले आणि घ्या आमच्या घराची झडती असे बोलले, झडती फार कसून घेतली. पण रंगो बापूजी पहिल्या झटक्यालाच गेला निसटून, तो कशाचा लागतो त्या हडेलहप्यांच्या हाती?" सारांश, सन १८६१ पर्यन्त तरी रंगो बापूजी निस्संशय हयात होता आणि तो असाच केव्हा तरी कोणाला तरी नेहमी भेटत होता. झाली. संपली येथे रंगो बापूजीची कहाणी.
परिशिष्ट
[मूळ ग्रंथात ठिकठिकाणी संदर्भ दर्शविलेले अस्सल पुराव्यांचे आणि विशेष माहितीच्या पुरवणीचे कागद, कटबाजांच्या जबान्या, रंगो बापूजीचे एक समग्र व्याख्यान इत्यादी या भागात दिले आहेत. सत्य पडताळून पहाणाराना नि इतिहास-संशोधकांना ते उपयुक्त वाटतील. - ठाकरे.]
(१) दादजी नरस प्रभूच्या गुमास्त्याचे यजित पत्र.
(क्षमेची याचना)
श्री
१५७५ मार्गशीर्ष शुद्ध ३
श्रीमंत राजश्री
सीवाजी राजे महाराज साहेबांचे सेवेसी
दा। बा। यजितपत्र बाबाजी सिवदेव सोनटके गुमास्ते दिमत दादाजी नरस प्रभु देशकुलकर्णी व गावकुलकर्णी ता उत्रोली व ता भोर ता रोहिडखोरे सु।। सलाम खमसैन अलफ हुजूर केदारजी बिन नरसोजी व खंडोजी बीन धर्माजी खोपडे देशमुख ता उत्रोली याचा महजर. गोत वगैरे माहाराजाचे समोर हाजर-मजालसीत जाला. कथला तुटून निमे निमे वतन उभयतानी खावे असे जाले. त्यात मी लबाडी करून आपले बिकलम लिहिले की देशकुलकर्णी म्हणोन घातले. याची खबर खोपडे देशमुखांनी हुजुर केली. सबब मला आणोन राजगडी कैद करावेसे केले.
त्याजवर मी कबूल जालो की मी चाकर प्रभु देशकुलकर्णी (याचा). यांनी आपले घर भावाचे मुले आणून चौघा गोताचे व ठाणे सिरवळचे अमीनाचे मत नजरणा होनु देऊन घेतले आणि दोन्ही खोरियाचे वतनास अधिकारी दादाजी नरस प्रभु देशकुलकर्णी व गावकुलकर्णी करून रोहिडखोरे व वेलवंडखोरेचे वतन चालवीत असता मी लबाडी केली, असे गोताचे व जमेदाराचे सरकारचे पारखीस आले. मी बिकलम आपले नावे लिहिले ते खोटाई करून लबाडीने लिहिले. ही चुकी मजकडून जाली. मी चाकर. वतनदार नव्हे, हा गुन्हा मजकडून जाला. याउपरी असी लबाडी केल्यास दिवाणाचा गुन्हेगार व गोताचा खोटा. छ ३ मोहरम हे लेहून दिल्हे सही हस्ताक्षर खुद.
गोदी
इ. इ. इ.
(याप्रमाणे कागद हुजुर लिहून दिल्हा त्याची नकल पुढे कामा येईल सबब दादोपंत दिमत सरकार याणे दिल्हे संन मार).
(रा. खं. १५, पान २८१)
- (१३ नवंबर सन १६५३ रविवार.)
(२) औरंगझीबाचा पुत्र मुअज्जीम बादशहा याचे कृष्णाजी दादाजी प्रभूच्या वतनाबाबत शाहूला पत्र.
१६३० ज्येष्ट वद्य ४
सलाम राजे शाहू यास की कृष्णाजी दादाजी प्रभू देशपांडिया यासमागमे आपली अर्जदास्त पा त्यातील मजमून आमची चुलती व सर्व नौकर लोक मिळोन फिसात करून आम्हावर फऊजा रवाना केल्या, आम्हा बुडवावे, आपण राज्य करावे, असी चिती व्देशबुधी धरून असे केले, त्यास बादशाही हुकमाने देसी राज्यावर आलो तो हा प्रसंग पडला. त्यास श्रीवरे व शूरत्वेकरून लढाई केली तो बादशाई-कृपेकरून फते पावलो व नौकरलोकास धरून नसेती केल्या. बंदोबस्ती करण्याचा क्रम चालला आहे. हुकूम की मनुष्य जरबेत राखावे व रयतलोक यांचे संरक्षण करावे व इनसाफ, बराई खुद जातीने पाहावी, बंडे बुडवावी म्हणजे धका नाही. त्याप्रमाणे हुकूम चिती दृढतर धरून राज्यपद्धतीने हिंदुशास्त्राप्रमाणे चालत आहो ही खबर कळावी, सबब मुदाम कृष्णाजी अर्जी देऊन वकिलाकडे पा. त्यास वकील मजकूर याणी हुजूर अर्जदास्त रसिद करून तुम्हाकडील नौकराचे मुखे साकल्य मजकूर श्रुत केला. त्यास पेशजी फर्मान तुम्हास जमेदारीबदल मिळाला आहे.
त्याप्रमाणे मुलकाचा वगैरे बंदोबस्त ठेवून कायम जाला, हा बहुत तुम्हास बादशाही कृपेने फायदा जाला हा संतोष मानीत आहो, व मावळ प्रांती शंक्राजी नारायण पंडत यांनी जबरीने दादाजी नरस प्रभू देशपांडिया कुलकर्णी रोहिडखोरे व वेलवंडखोरे प्रा मावळ कृष्णाजी प्रभूचा बाप हा कदीम जमेदार असता त्याचे वतन घेतले व आणखीही बहुत जमेदार व रयत लोकांच्या तसनसि केल्या. ये बाबे पंडत यास तुम्ही आणविले आसता न आले. हिरकणी खाऊन मेले. त्याचे नारो पंडत नोकरीस ज्यारी. त्यास तुम्ही तो इनसाफीत नजर व बंदोबस्ताविसी इरादा ठेविला आहे.
येविसी प्रभूनी अर्ज केल्यावरून त्यास ज्याची जमेदारी कदीमपासून असेल ती अवलाद अफलाद चालवावी व राज्यात जुलूम जाहला तो न्याय करून रयतेस सुख द्यावे व प्रभूचे वतन प्रभूकडे चालवावे. प्रभू आपणापासी जोत्याजी केशरकर याचे दिमतीने हुजूर तुम्हासाठी तुमचेसमक्ष नोकरी केली आहे. तुम्ही नेक चालीने चालून बादशाही कृपेने दौलतीची बढती करून घ्यावी. येविसी रायभान वकील याजवळ हुकूम पेशजी जाला तो एकंदर मजकूर लिहिला. बादशाही लोभ विशेष जाणावा छ १७ रबिलावल सन ३ मुताबिक सन ११२०. (असल फरमान महाराजापासी दिल्हा. मराठी नकल बादशाहा मुनसीपासी केली ती हुजूर सातारमुकामी दाखऊन आपल्याजवळ नकल राहावी म्हणून विनंती करून घेतली.)
(रा. खं. १५, पा. २९८-२९९)
(१७ मे १७०८ गुरुवार.)
(३) भोरचा पंतसचिव
भोरचा पंतसचीव हा सातारच्या छत्रपतीचा मांडलीक जहागिरदार, पूर्वीची वहिवाट आणि कंपनी सरकारचा प्रतापसिंहाशी १८१९ साली झालेल्या तहनाम्याप्रमाणे, त्याच्या जहागिरीवर छत्रपतीचे संपूर्ण स्वामीत्व. सचिवाला दत्तकाची परवानगी देणे अथवा जहागीर खालसा करणे, हा हक्क छत्रपतीचा. परंतु "वहिवाटीत व दस्तयेवजात इंग्रजी सरकारतून खलेली आणली." म्हणून या प्रकरणाच्या शेकडो कागदपत्रातून काही निवडक मुद्यांचे सारांश निवडून बळवंतराव चिटणिसाने एक याद तयार केली. त्यात ३३ कलमे आहेत. त्यांपैकी काही जुजबी त्या अस्सल यादीवरून येथे नमूद केलेले आहेत.
(१) जेम्स ग्रांट रसिदंट. छत्रपतीच्या जहागिरदारांवरील संपूर्ण स्वामित्वाचे स्पष्ट समर्थन.
ता. २२ एप्रिल १८२०.
(३) एलफिन्स्टन गवर्नर. ता. १२ सप्टेंबर १८२६. "जाहागिरदार यांनी वकील मुंबई मुकामी ठेवणे जरूर नाही.
(४) चिटणीसाचा लक्ष्मण बाबूराव मामलेदार पेटा वाई यास ता. ८ सप्टेंबर १८२० चा हुकूम - हुकुमाप्रमाणे सचिव दसऱ्याला आले नाहीत, सबब मौजे बावडे पैकीं सिरवल जप्त करावा.
(६) जेम्स ग्रांटचा चिमणाजी सचिवाला ता. ७-१२-१८२० चा इषारा. – "महाराज सरकारचे हुकुमाप्रमाणे तुम्ही वागत नाही. दसरियास येण्याविसी हुकूम वकिलास जाला असता, हुकूम न घेता पुण्यास गेला. महाराज सरकारचे हुकूम न मानिल्यास कंपनी सरकारचे सलेनी तकसीर माफ होणार नाही."
(७) कर्नल रॉबर्टसन. ता. १४ सप्टेंबर १८२७ सचिवाकडच्या एका आरबाने खून केला. तो पुणे मुकामी कैदेत आहे. असे राबिनसन याने अंलपिष्टन गवर्नर यास लिहिले. त्या अरबाला महाराज सरकारकडे पाठवून द्यावे. त्याची चौकशी करण्याचा अधिकार छत्रपतींचा आहे. कंपनी सरकारचा नव्हे.
(९) गवर्नर एलफिन्स्टन याचे चिमणाजी सचिवाच्या अर्जाला उत्तर. ता. १५ मोहरम सु "आपणाकडे व आपले आवरस पुत्राकडे जाहगीर बहुत दिवस चालेल ही उमेद आहे. दिगर. दतपुत्राविसी श्रीमन्माहाराज छत्रपती साहेब याचे सरकारतून कलमबंदीची याद आली म्हणोन लिहिले. त्यास आवरस पुत्राकडे जाहागीर चालेल. परंतु आवरस पुत्र नसल्यास आपली जाहागीर महाराज सरकारात येती. दस्तपुत्र देऊन किंवा आणखी काही तजवीज करून महाराज मेहरबानीने जहागीर चालवितील, ही मुखत्यारी महाराज सरकारकडे आहे. बमुजवत होण्याकरिता या सरकारातून सिफारस करण्यात येईल."
(१०) कर्नल रॉबर्टसनचे महाराजास पत्र. ता. २९-११-१८२७. सचिव हद्दीत नेरे येथे बंडावा झाल्याचे पुण्याचा सुभा राबिन्सन लिहितो. बंडखोरांनी नेरे नसरापुर नि नायगाव येथील लोकांकडून खंडणी वसूल केली. ठाणेदाराने खबर दिली नाही. बंदोबस्ताविषयी सचिवाला लिहून जावे.
(११) रॉबर्टसन ता. ६-१२-१८२८ ला पुन्हा लिहितो कीं पुणे सुभा राबिन्सन सचिव हद्दीतील बंडाबद्दल इकडे वरचेवर लिहितात. इकडून जबाब दिरंगाईने जातात. तेव्हा राबिन्सनला परभारे सचिवाकडे लिहिण्याची महाराजांनी मोकळीक द्यावी. परस्पर याद्यांच्या नकला इकडे येत जातील.
(१२) रॉबर्टसन. ता. ६ डिसेम्बर १८२७. "चिमाणाजी शंकर यांनी दतपुत्र रघुनाथराव यास घेतले. त्याजबद्दल सरकारची नजर येणे पैकी बहुतेक सूट देऊन च्याळीस हाजार रुपये नजर ठरविले. त्यास हाप्तेबंदी पाच वर्षांची लाविली व चाकरी ठरविली. यातही बहुतेक सूट देऊन दरसाल पंधरा हजार रुपये ठरविले. येविसीच्या कबुलाती रघुनाथराव यांनी लिहून दिल्ह्या. व पंधरा हजार रुपये येतील त्यात कारकून वगैरे ठेवावयाचे म्हणोन लिहिण्यात आले. यैसियास सचिव याजवर महाराज सरकारकडून बहुतेक मेहरबानी करून कितेक कलमात सूट देऊन ठरविले ते ठीकच आहे. पंधरा हाजार येतील त्यात सिबंदी वगैरे महाराज सरकारचे नजरेस येईल ते ठेवण्यात यावे."
(१३) चिमणाजी शंकराला दत्तविधानाची परवानगी देऊन रघुनाथरावाचा बंदोबस्त केल्याबद्दल गवर्नराला `बहुत संतोष जाला`, असे रॉबर्टसन महाराजास कळवितो. ता. ३-२-१८२८.
(१५) पाली तर्फ खेड येथील जगनाथ दादाजी गोंधळेकर यांचे घरावर दरोडा पडल्याची बातमी रत्नागिरीहून आली. चोरटे सचिवांच्या हद्दीतले. ते कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हवाली त्यांना करीत नाहीत. सबब महाराजांनी सचिवाला ताकीद देऊन बंदोबस्त करवावा, अशी रॉबर्टसनची छत्रपतीला याद. ता. २६-१२-१८२८.
(२२) रोहीडखोऱ्यातले नागोजी सर्ज्याराव जेधे देशमुख आणि बापूजी रामचंद्रप्रभु देशकुलकर्णी यांच्या इनामाबाबत तंट्यांची प्रकरणे आणि सचिवाविरूद्ध फिर्यादी गवर्नर कौंसलात मुंबईला गेल्या असता, मि. वॅथेन. चीफ सेक्रेटरी यांनी "महाराज सरकारचे इलाख्यातील कामात इंग्रजी सरकारातून दखलगिरी होत नाही." असे शेरे मारून ते अर्ज फेटाळण्यात आले.
ता. २२ जानेवारी १८३४.
(२३) मौजे जांभुळपाडा प्रांत कोकण येथे दोन बाया सती गेल्या. त्यावर सर रॉबर्ट ग्रांट यांनी सचिवाला लिहिले की "आम्हास नाखुसी जाहली महाराज सरकार याही इंग्रजी सरकारचे रयतेनी सती न जाण्याचा बंदोबस्त केला. त्याप्रमाणे करावे." रघुनाथराव सचिवाने कळविले कीं महाराजांचा असल्या प्रकरणी आम्हाला काही इषारा आजवर नव्हता, म्हणून असे झाले. पुढे होणार नाही.
(२७) परइलाख्यातील सावकारांकडून कर्ज घेऊ नये, अशी महाराजांची रसिदंटामार्फत ता. २ मार्च १८३४ ची यादी रघुनाथ सचिवाला गेली. त्यावर "आम्ही कोणाचे इलाख्यातील हे कलले पाहिजे", असे मगरूरीने लिहिले, "नंतर बालाजी नारायण नातू यांनी हुजूर सरकारात विनंती केली की पंत सचिव यांनी गैरसमजुतीने लिहिले. ते पत्र मजपासी माहाराजांनी कृपा करून द्यावे." `मागाल तेव्हा देईन` अशा अटीवर महाराजांनी ते नातूला दिले.
(२९) एलफिन्स्टन गवर्नर, ता. १ आगटंबर सन १८२६ लिहितो. – "रसिदंटावर काही गीम असल्यास तो मजकूर रसिदंटाखेरीज परभारे बोलणे ऐकून घ्यावे."
(३०) रॉबर्टसन रसिदंट. ता. २७ सप्टेंबर सन १८३० "जाहगीरदार याचा निरवंष जाहल्यास आगर काही गुन्ह्यात आल्यास, त्या जाहागिरी माहाराज़ सरकारात येतात."
(४) रंगो बापूजी ईस्ट इण्डिया कंपनीच्या नोकरीत.
तारीख ११ माहे दिसंबर
मार्गशीर्ष मु।। तिकोटे.
श्री
अर्जदास्त रंगो बापूजी आमीन पो नंदुरबार सन १२३० फसली ऐसीजे. साहेबी हुकूम केला कीं सन २७ चे साली पो नासिक येथे तुमचा मामला होता ते समई मौजे लाखनगांव पो नासिक हा गांव वीस वर्षे चालत नसता तुम्ही सोडिला. त्यास आधार काये. कशाकरून सोडिला हे सांगणे म्हणोन हुकूम केला, ऐशास तेथील हकिकत तरी सन २७चे साली महतपुरची लढाई जहालियावर कपतान ज्यान ब्रिगसाहेब बाहादुर याचे पत्र उजनचे मुकामीहून मैरालभाऊ यास व मजला बोलाविण्याविसी आले. त्याजवरून मी पुणियाहून निघून पुणतांब्याचे मुकामी येऊन साहेब बहादूर याजपासी हाजर जालो. नंतर लस्करचे कूच होऊन औरंगाबादेस गेलो.
मी बराबरच होतो. तेथून बाजीरावसाहेब याचा मुलूक सर करण्याचे ठरले. तेव्हा वैजापूरचे मुकामीहून माझी रवानगी फक्त येक जाहीरनामा मात्र पुणियाचा आला तो देऊन केली आणि गंगथडी वगैरे ठाणी बसवावयासी हुकूम जाला. ते समई सिबंदी कोणी मिळेना व कारकूनही कोणी न मिळेत. सर्व पेशव्याचे फौजेचा अंदेश घेऊन जमीदार व मोकदम व रयत कोणी अनकूळ न होई. तेव्हा हरएक मनुषाची खातरजमा करून मनुषे मेळवून पो नासिक व पो कुंभारी व पो पाटोदे व सिन्नर व पो वण व पो दिंडोरी व घाटाखालील पेठ हरसूल राज्याचे येथील ठाणी कायेम करून नंतर किले घेण्याची सुरुवात केली.
तेव्हा किल्ला हतगड व रामशेज व देहर व बहुला व वाघेरा ऐसे घेतले. नंतर किल्ले कावनई व गडगडा व त्रिंगळवाडी हे तीन किल्ले पेशव्याकडील आमलात आमचे व्याह्याकडे होते. ते किल्ले हस्तगत होईनात. तेव्हा कळेल त्या रीतीने त्याची खातरजमा करून भेटीस म्हणोन बोलवून आणून धरून घेऊन साहेबबहादूर याचे जवळ हजर केले आणि तिन्ही किल्ल्यावर ठाणी कायेम केली. या प्रो कितके किल्ले व महाल लढून व कितके फूस लावून घेतले. मधेमधे पेशव्याकडील फौजेची व रूपराम चौधरी यांचे पलटणाची गांठ पडून तेथ छापा वगैरे घालून साहेबाचे प्रतापे पराभवाते पावविले व लूट तोफा वगैरे सरंजाम सापडला तो सरकारात दाखल केला. हे सर्व इप्रेल महिना व मे महिन्याचे दाहा पंधरा दिवस परियेत महाल घेणे जाले. अशास दररोज स्वारी करून किल्ले व ठाणी साहेबाचे घेऊन कायम केली. तशात मामल्याचे काम.
दरयाप्ती (समजणूक, चवकशी) करून पाहाण्यास व किल्ले घ्यावयास फुरसत येक क्षणाची नाही व मनुष्ये व कारकून कोणी येक ते समई मिळेनात व रयेत लोकही कोणी जमीदार पाटील वगैरे हजर न होता, आंदेशा पेशव्याचे फौजेचा धरून कोणी चाकरही राहीनात, असा समेय. त्यात कोन्हासी काही दिलदिलासा देऊन इनाम बक्षीस कळेल त्या रीतीने मनुष पाहून कबूलही केली होती. तशात कोणत्या दस्ताऐवजावर गाव दिल्हा म्हणाने विच्यारले. त्यास सरकारचा जाहिरनामा होता की कोणाचे वतनास व इनामास व वर्षासनास व देवस्थानाचे खर्चास व खैरातीस व कोणाचे ज्ञातीधर्मास खलेल न होता सुरलीत चालेल म्हणोन जाहीरनामा होता. त्या आधाराने सर्वांचे मनोधारण करून सरकारकाम चालवावे याजवर नजर देऊन काम चालवीत होतो.
कोणी पेशव्याचे फौजेस सामील न व्हावे असा जाहीरनामा. त्यावरून कोणी कोणी मामल्याचे कामात माझा एक गांव मजकडे चालत आहे, तो माझा मजकडे चालावा म्हणोन कोणी येत होते. परंतु ते समई त्याची दरयाप्ती करावयासी पुरसत नाही. आपणास तर सर्वत्राचे मनोधारण रंक्षून सरकारकाम करून घ्यावयाचे व बंड कोठे न होता ठाणी कायम करावयाची, याजवर द्रिष्ट देऊन व जाहीरनामाही पाहून व सरकारहुकूम कीं तुम्हास कळेल त्या रीतीने ठाणी हस्तगत करणे. त्या हुकुमावर जे कोणी गावचे चालत्या स्वारीत येत गेले त्यास गावकरी यास हतचिठी देत गेलो कीं हा गांव याजकडे चालू देणे, असेही कितेक गावास चिठ्या दिल्या. त्यास लाखनगावकर जाहागीरदारही आले असतील. त्यांनी मजकूर समजाविला असेल. ते समई याजकडे गांव आहे म्हणोन त्याचे सांगितल्यावरून गावचे मोकदमास हतचिठी दिल्ही, याप्रा जाहले असेल. परंतु सनद कोणास लिहून दिली नाही व सारा वसूल त्याजकडे पडला असेही जाले नाही.
जर ते समई अगर पुढे आठच्यार दिवसी जमीदार आथवा गावकरी येऊन सांगते कीं हा गांव याजकडे वीस वर्षे चालत नव्हता ऐसे यांनी समजाविले असते तर बंद केला असता, ते समई त्यांनी सांगितले नाही. पुढे दर्याप्ती करावी, तर माझी बदली जाली. त्यास माझा उपाय काये? पुढे चार महिन्यांनी नगराकडे महाल लागला, तेव्हा आखेर साली दर्याप्ती व्हावी तीही न जाली. येथपासून दीड मास परियंत वहिवाट होती. नंतर महाल दुसरीकडे सांगून छोटे. साहेबाचे तैनात महिनाभर होतो. नंतर मजला खानदेशात बोलावून नंदुरबाराकडे पाठविले. पुढे ऑगष्ट महिन्यात सरकारचा जाहीरनामा आला कीं वर्षासने व धर्मादाव व देवस्थाने व इनाम व धर्मार्थ गाव ज्याचे त्याजकडे चवकशी करून चालू देणे.
ऐसे पेशजी मी कामावर होतो ते समई जाहीरनामा आला असता तरी मी चवकशी केली असती. त्या वेळेस जो मामलेदार होता त्यांनी चवकसी करावयाची होती आणि चालवावयाचा नव्हता. त्यासही दोन वर्षे जाली. आता मजला विचारल्यास मजकडे दोष कार्य आहे? साल तिगस्ता सन १८१८ नवंबर महिन्यात असेच एक तळेगांव पो नासिक प्रकर्णी पुणियाहून लिहिले आहे. त्याजवरून साहेबांनी मजला लिहिले होते. त्याचेही उत्तर वास्तविक होते, ते मी लिहून पाठविले. त्याजवरून साहेब बहादूर यांनी पुणियास लिहून पाठविले होते तेही आपण पाहावे.
आमची हकिकत वास्तविक जाली आहे ती साहेबास लिहिली आहे. याउपर हल्ली कोणी साहेबाजवळ गैरवाका समजावीत असल्यास त्यांची छ्यान करणार धणी समर्थ आहेत. मी जिवापेक्षा अधिक श्रम करून सरकारचाकरी बज्याविली आहे. ईश्वर जाणत आहे व खावंदसाहेबास माहीत आहे. तारीख ३ माहे डिसेंबर, सन १८२० इसवी हे अर्जदास्त.
[पे. द. ४१ नं. २५९]
(५) रंगो बापूजीचे छत्रपति प्रतापसिंहाला पत्र
(ता. १४ नवंबर १८३१)
श्री
छत्रपती अर्जी चरणरज रंगो बापूजी चरणावरी मस्तक ठेवून विज्ञापना ऐसी जे-मजकडून चाकरी अव्वल इंग्रजीत राजकारणी झाली ती तपसीलवार विनंती महाराजांचे चरणी श्रुत व्हावयास लिहिली आहे. स्वामी माहाराजांनी मनन केली पाहिजे. शके १७३६ या सालात श्रीस्वामी चाफळाहून बोरगांवास श्रीमंत राजश्री मल्हारराव दादासाहेब व बाळासाहेब चिटणीस यांचे भेटीस आले. नंतर विचार केला कीं, श्रीमन्महाराज राजश्री.
स्वामी यांस बाजीराव रघुनाथ प्रधान यांनी किल्ले सातारा येथे ठेवून बंदोबस्तास काशीपंत बंदरे वगैरे ठेविले आहेत, तेथे अडचण फार आहे. परंतु काही राजकारण इंग्रजबहादूर यांजकडून अल्पिष्टन साहेब पुण्यात वकीलाचे कामावर आहेत. त्यांजकडे प्रवेश करून हा सविस्तर मजकूर कळवून काही उपयोग होई आणि महाराजास मोकळे करून देऊन दौलत सर्व हातास येई ऐसी तजवीज करावी. मग श्रीस्वामींनी श्रीदेवास प्रार्थना करून, मसलत करावी सिद्ध होईल असे ठरून त्रिवर्गानी (रंगोपंत, दादाजी) विचार करून, मला पुण्यास पाठवावे असा विचार करून तीर्थरूप श्रीस्वामींनी मला अनुग्रह देऊन, पायावर हात ठेवून घेऊन, ही चाकरी सांगितली.
त्या काळी मी विनंती केली की, माझे वतन ता रोहिडखोरे येथील देशकुळकर्णीचे वगैर पेशजी कैलासवासी राजाराम साहेब महाराज यांचे कारकीर्दीस सचिवपंत यांनी घेतले व गांवकुलकर्णी लोहकर वगैरे गुमस्ते यांनी घेतले. त्याबद्दल तंटा कैलासवासी शाहूमहाराजांचे कारकीर्दीत जाहाला. ते वेळची कागदपत्रे वगैरे साधनी मजजवळ आहेत ते पाहावे. माझे वडील दत्तक दादाजी प्रभू, नरसप्रभू देशकुलकर्णी व गांवकुलकर्णी ता मावळ यांनी गोत्र पुरुष ता वेळवंडखोरे येथील दादाजी प्रभू वतनाचा भोगवटा करीत असता, सचिवपंतानी जबरीने अफलादीचा वंश म्हणोन कागद लेहून घेऊन वतन घेतले. तरी या मसलतीस यश आल्यावर माझे वतन मज मिळावे.
या वतनानिमित्य रामवाजीबाबा, माझे आजे, पेशवे यांजकडे फिर्याद गेले. ते वेळी पाणपतावर जावयास निघाले. ते काळी त्यांनी सांगितले कीं, तुम्ही बराबर चालावे. ही मसलत जालियावर तुमचे वतन पंताकडू देववूं. पुढे पाणपतावर तिकडेच गर्दीत मारले गेले. पुढे वाद तसाच राहिला. सचिवपंत जबरदस्त विलाज चालत नाही. त्यास हल्ली आपण मनावर घेऊन वतन देवावे. बरे बोलून वचन दिल्हे कीं, तुझे वतन महाराज खाली येऊन राज्य करू लागल्यावर सोडून देऊ. तों इतक्यात पुण्याहून चिंतोपंत देशमुख, पेशवे यांचे कारभारी यांचे पत्र चिटणीसांस बोरगांवी आले की, वाडीकर सावंत यांचे बोलणे इंग्रज याजपासी पडले आहे कीं, आम्ही चाकर पेशव्यांचे नव्हे, आमची दौलत निराळी. त्यास त्याचे साधनी कागद असतील ते घेऊन यावे, एविसी परवानगी श्रीमंत यांची आहे. त्यावरून दादासाहेब निघून पुण्यास गेले. बरोबर मलाही नेले.
तेथे जाऊन देशमुखांकडून श्रीमंतांची भेटी घेतली. वाडीकर सांवतांचा हेनामा दाखविला, नंतर श्रीमंतांनी बडेसाहेबास दाखविला. त्यांनी विचारिले कीं आजपावतो हा कागद निघाला नाही, हल्ली कोठून निघाला. मग त्यांनी सांगितले की माहाराजाकडील चिटणीस याजपासी होता. तो त्याजकडून आणविला. नंतर हा मजकूर चिंतोपंत रावजी देशमुख याजपासी कळला तो सविस्तर चिटणीसांपासी सांगितला. नंतर साहेबांची भेट होऊन ओळख करावी ही तजवीज देशमुख याजपासी विचारली. त्यांनी सांगितले कीं, बाबाजी आंगरे याजकडील कारभारी यांचे येथे साहेबांचा येण्याचा पाठ आहे व बाळाजीपंत नातूही त्याजकडे आहेत. नंतर बाबाजी आंगर याजकडेच जाऊन त्यासी विचार करून साहेबांची भेट घेतली. तेथे मला बरोबर नेऊन, आंगरे याजकडील कारभारी यास न कळता, साहेबाची रुजुवात करून दिल्ही. साहेबांनी विचारले कीं, महाराजसरकारांनी पेशव्यांस दौलत कशी दिल्ही व कोण्ही कोण्ही दौलतदार वगैरे महाराजांपासी राहून चाकरी कसी केली हे सविस्तर आम्हास कसे कळेल.
नंतर चिटणीसांनी सांगितले कीं, साहेबांनी हा मजकूर श्रीमंतास विचारावा. मग त्यांनी आम्हास सांगितल्यावर सविस्तर मजकूर कैलासवासी शिवाजी महाराज यांचे कारकीर्दीपासून प्रकर्णे लिहून त्यांस देऊ. नंतर साहेब यांनी श्रीमंतांस हा मजकूर विचारून, बखर लिहून आणवावी, सांगितले. त्याजवरून पुणे मुकामीच दादासाहेब चिटणीसांनी बखर तयार करून दिल्ही. त्या निमित्य त्यांनी मला गारपिरावर बंगल्यास पाठविले. निरोप सांगितला कीं पेशवे यांजकडून महाराजांस किल्ल्यावर फार अडचण होती. ते धनी व बाजीराव हे महाराजांचे चाकर असतं असे होते. तों त्यांनी सांगितले कीं, हे राजकारण तुम्ही महाराजांस कळवून करता किंवा कसे. मग परत मी चटणीसांस सांगितले. त्यांनी सांगून पाठविले कीं, महाराजांस किल्ल्यावर फार अडचण, त्यांचे दर्शन होणे फार कठीण आहे. त्याजवर साहेबांनी सांगितले कीं, हर प्रयत्ने त्यांस कळवून करणे ते करावे. नंतर दादासाहेब चिटणीस जैतापुरी एऊन, तीर्थरूप श्री स्वामीस बोलावणे चाफळास पाठवून, आणविले.
जाला मजकूर सांगितला. मग विचार करून राजश्री रंगोपंत दादा यांस पाठवून राजश्री विठ्ठलपंत बाबा व दाजीबा उपाध्ये व सेटिबा देवपुजे यांचा विचार घेऊन, किल्ल्यावर जाणार येणार कोण याची माहिती पुसून, तात्या नारोळकर वैद्य व कृष्णाबाई व नरसू काकडे व खंडेराव महाराजे शिर्के, असे जातात येतात कळले. त्यासी बोलून सिद्धांत केला आणि एक निरोप सदरहू राजकारण इंग्रजाकडे करितो असा तात्या नारोळकर यांजबरोबर किल्ल्यावर सरकारकडे पाठविला आणि सदरहू सातार मुकामी मंडळीची ओळख रंगो बापूजी जाली पाहिजे म्हणोन रंगोपंत दादास बरोबर घेऊन सदरहू मंडळीची रुजुवात करून दिल्ही आणि दाजीबा उपाध्ये व तात्या नारोळकर यांजपासी सांगितले की रंगोबा उद्या पाठवितो. तुम्ही आज संध्याकाळी किल्ल्यावर जाऊन सदरहू मजकुराची सूचना माहाराजांस करून ठेवावी आणि माहाराजांचे हतची चिठ्ठी रंगोबापासी साहेबास ओळख पटण्यास द्यावी, अशी तजवीज करावी सांगून रंगोपंत परत गेले.
रंगाबास फार असे बोलले. मला श्रीस्वामींनी आपली झोळी देऊन गोसावी करून चिठ्ठी चावी अशीं चिठ्ठी लिहून दिल्ही. ती चिठ्ठी मी सातारियात येऊन श्री मंगलाईचे देवीचे दर्शनास जातो म्हणून मजकुरी किल्ल्यावर चौकीदारास सांगून गेलो. तेथे चिठ्ठी तात्या उपाध्ये नारोळकर यांजपासी दिल्ही. नंतर माहाराजांपासून सरकार चिठ्ठी त्यांनी आणून मजपासी दिल्ही, ती चिठ्ठी खाली येण्याबद्दल पायास कुतरे चावले असा बाहाणा करून पायास भोक पाडून जखम करून रक्त न पुसता व ताजा चुना लाऊन काही झाडपाल्याची पेंड पायावर बांधून ती चिठ्ठी खाली आणीत असतां कासीपंत बेदर (बंदरे) शहराहून किल्ल्यावर येता तो माझी दरवाज्यास गाठ पडली. त्यांनी दरवाजेवाले यास शिव्यागाळी देऊन हा गोसावी कोठून आला आणि कोठे जातो विचारून झाडा घेऊ बोलला कीं हा फितुरी आहे. गोसावी नव्हे, बोलून पाहऱ्यात ठेविले आणि वरत गेले. तेथे जाऊन कारकून पाठवून झाडा आणखी आपले रुबरू घेतला असतां पुन्हा घेऊन जरब लावून चौकशी केली. परंतु काही ठिकाण लागले नाही.
सबब चिंचेच्या फोका आणून मारतो बोलून बेडीही आणू अशी जरब दिल्ही. परंतु कोणाचे नाव न घेता काही कबूल जाला नाही. तो हे वर्तमान जैतापुरास राजश्री विठ्ठलपंत बाबाजीस सांगून पाठविले. वर्तमान कळतांच श्रीस्वामी व चिटणीस व रंगोपंत दादा स्नान भोजन टाकून दोन दिवस एक जाग्यास विचार करीत बसले. तों येथे मी काहीच ठिकाण लागू न देतां पाहऱ्यात होतो. मग दुसरे दिवशी गोसावी भिकारी, याजपाशी काही नाही, वेडा आहे, म्हणोन सोडून दिल्हे. नंतर मी माहुलीहून जरांड्याचे डोंगराकडून संध्याकाळी जैतापुरीं रात्री जाऊन स्वामीस व चिटणीसास व रंगोपंतास भेटलो. नंतर स्वामींनी मला पोटासी धरून नेत्रातून पाणी आंगावर टाकिले.
फार श्रमी सर्वत्र जाहले आणि बोलिले की आज काशीपंतानी चिंचेच्या फोका व बेडी वगैरे जरब देणे ती दिल्ही. परंतु तू कोणाचे नाव न घेता सर्वांचा बचाव केलास व माहाराजांची हातची चिठ्ठी पायाचे मनगटास बाधून आणली ही गोष्ट श्रींनी मोठी केली. बर, माहाराजांचे पायास तू मळ लाविला नाहीस. मोठे संकटातून पार पाडिलेस. नाहीपेक्षा प्राण चिटणीसांनी व आम्ही व ज्यांची नावे कळती त्यांनी देणे आला होता. विठ्ठलपंतबाबा इत्यादी तू आज वाचविलेस, बोलून ये वेळेस बक्षीस तुला काय द्यावे बोलले. मग मी उत्तर केले की मला वतन सचिवपंताकडून घेऊन देतो म्हणोन पेशजी वतन दिल्हे ते सोडून देण्याचे वचन आपण व चिटणीस व बाबाजी दिल्हे त्या प्रमाणे कार्य सिद्धी जाहलियावर द्यावे. नंतर श्रीस्वामींनी श्रीरामाची पूजा करतेवेळी शफत वाहून तुळसी देवावरील दिल्या आणि सांगितले की हे वचन आज माहाराजांनीच दिल्हे असे समज. हे वचन महाराज चालवितील.
तुझे वतन हरप्रयत्न घेऊन देऊ बोलले व चिटणीसांकडून व बाबांकडून वचन रंगोपंत दादाचे साक्षीने देविले. नंतर पुण्यास बडे साहेबांकडे पाठविले. बाळाजीपंत नातू यांजकडे जाऊन भेटले. तेथे चिठ्ठीचा मजकूर कळवू नये, साहेबांस मात्र कळवावा, असे सांगितले होते. साहेबांचा चपराशी वोळखीचा पेशजीचा होता. त्याजकडून आधी साहेबांस सांगितले की नातू गेल्यावर मागे मला ठेवावे, मला मात बोलावयाची आहे, सांगून ठेवून मग बाळाजीपंत दादाबरोबर जाऊन गारपिरावर भेटलो आणि निरोप सांगितला की माहाराजांस फार अडचण केली आहे ती किती सांगू, बोलले. मग साहेबांस (साहेबाने) सांगितले चिटणीसास आमचा सलाम सांगावा आणि नातूस बोलले की तुम्ही जावे.
उठते वेळेस बोलले आणि कारकून आला आहे तो येथे असू देणे. तुम्ही जावे. आमच्या खान्याची वेळ आहे. त्याजवरून मला तेथे ठेवून नातू गेले. मग मला विचारले की काय बोलावयाचे आहे ते सांग. नंतर चिठ्ठी पायातील सोडून मी काढून दाखविली. साहेब बहुत खूष होऊन आच्छा किया बोलून नंतर किल्ल्याचे दरवाज्यास धरले वगैरे जाला मजकूर सांगितला. हा ऐकून बुकावर माझे नाव लिहून घेतले. मजकूर ऐकून पाच मोहरा बक्षीस दिल्या. जाणे म्हणोन सांगितले. मग मी बोलिलो की मी येथे आल्याची ओळख द्यावी बोललो. नंतर त्यांनी इंग्रजी आक्षराची चिठ्ठी लिहून दिल्ही आणि मतलब सांगितला की माहाराजांची चिठ्ठी पावली, आमची आता खातरी जाहली बोलले व माहाराजांची चिठ्ठीही मागितली ती परत दिल्ही आणि नातूस चिठ्ठीचा मजकूर न सांगावा, त्यास भेटून जावे, साहेब बोलले. मग मी बोललो की त्यास सांगतो की साहेबांनी विचारले की स्वामी हे कोण. त्यास मी सांगितले की माहाराजाचे गुरू. त्यांनी ऐकून पादरी मात्र बोलले आणि टोपी डोईची काढून सलाम सांगितला. चिटणीसांसही सांगितला व विठ्ठलपंत कोण हे विचारले. नंतर मी सांगितले की ते फडणीस, असे बोलता साहेबांनी ही ओळख बाळाजीपंतास देणे जाहल्यास द्यावी. नंतर बहुत खूष जाहला आणि बोलला की महाराज सबका धनी आहेत. नंतर निरोप घेऊन निघालो.
चिठ्ठ्या तेलात भिजवून लाखेची गोळी पोकळ युक्तीने करून, ती गोळी चुनाळात घालून, वर चुना बसवून, मग बाळाजीपंत दादाकडे गेलो. त्यांनी एकीकडे नेऊन विचारले की साहेबांनी आणखी काय तुला पुसिले. मग सदरहू मजकूर सांगितला. नंतर निरोप घेऊन येत असता, शिरवळचे नदीवर आलो तो तेथे शिपाई यांनी अडविले. वाटसरू लोकांचे झाड्याबरोबर माझाही झाडा घेऊ लागले. ते वेळेस बाळाजीपंत नातू यांनी चिठ्ठी दिल्ही ती बटव्यात होती. झाडा देतेवेळेस आधी जल्दी करून तोंडात घातली. तंबाखू खाल्याचा बहाणा करून चिठ्ठी खाऊन झाडा दिल्हा. तेथून निघोन भिकारियाचे सोंग दाखवून श्री माहादेवांकडून चाफळास श्रीस्वामी व दादासाहेब चिटणीस व रंगोपंत दादास येऊन भेटलो आणि चिठ्ठ्या स्वामींपासी देऊन तेथे दोन दिवस राहिलो. नंतर स्वामींनी व चिटणीसांनी चिठ्ठ्या ठेवून घेऊन मल सदरहू मजकूर कळावा याकरीता राजश्री विठ्ठलपंत बाबांकडे पाठविले. सातारियास बाबांचे घरी संध्याकाळी येऊन भेटलो. सविस्तर जाहाला मजकूर सांगितला. ऐकून संतोषी होऊन मला पोटाशी धरले.
फार मेहनत केली बोलून जाला मजकूर सर्व माहाराजांस कळवावा मी बोललो. नंतर तात्या नारोळकर व दाजीबा उपाध्ये यास बोलावून आणून कच्चा मजकूर सांगून किल्ल्यावर सरकाराकडे पाठविले. नंतर त्याचे बरोबर माहाराजांची आज्ञा निरोप आला की चिटणीस वगैरे पुरातन सरकारपदरचे, या समई सेवा करून दाखवावी. परंतु आपला बचाव करून करणे ते करावे व स्वामीस ही विनंती करावी की श्रींची प्रार्थना करावी. याप्रमाणे श्रीमंत मातुश्री माईसाहेब व महाराज बोलले. कोबाड यासी पडला. हे पेशजी केलेच असेल. हाला आम्हापासी राजकारण प्रकरणीं काही कागद साधनी वगैरे होते. ते कागद आम्हाला आंदेशा येऊन सारे खोलीत एकीकडे बसून जाळून पाणी करून टाकिले, अशी अडचण आहे. तरी जपून अंगावर न येता सावधगिरीने जे करणे ते करावे. तूर्त तुम्हास पुरा आश्रयही तेथे कोणाचा नाही व ही मसलत सेवटांस न्यावी.
सर्व दौलत स्वामींचीच आहे. ते जे करतील ते आमचे कल्याणाचेच करतील. हा भरवसा मला आहे. सदरहू निरोप बाबांपासी आला. त्यांनी सांगितला. नंतर विठ्ठलपंत बाबांनी मला बोलावून सदरहू आज्ञा आली ती सांगून पुन्हा चार साहा घटका गेलियावर मी काय सांगितले ते मला पुन्हा तुम्ही सांगावे. मग मी बाबांनी सांगितल्याप्रमाणे सांगून बाबांस मी बोललो की मी सांगितल्याप्रमाणे आहे. बातमी फार नाजूक, जिवावरील आहे, बहुत तजविजेने राहावे आणि लाहान माणसाची संगत असल्यास करू नये. कारण माणूस स्नेह्यापासी बोलते. त्यात ही गोष्ट निघाली म्हणजे घात होईल. नंतर मी विनंती केली की येविसी आपण सहसा काळजी करू नये. प्राण जरी गेला तरी बोलणार नाही, हा भरवसा आपणास बोलून दाखवू तो काय.
आपण काही काळजी करू नये. नंतर आमची खातरी जाहली आहे, परंतु आपण मात्र जपून राहावे. काशीपंताची बातमी फार आहे. किल्ल्यावरून येणाराची बातमी ठेवितात. मग मला बोलले, सर्व पार करणार स्वामीचे पाय आहेत. महाराज राज्य करू लागल्यावर तुझे वतन सोडून बंदोबस्त करीन म्हणोन शफत कुलस्वामींची दिल्ही. नंतर निरोप दिल्हा की चाफळास जाऊन सदरहू मजकूर श्रीस्वामीस व चिटणीसांस सांगितले. ऐकून बहुत संतोष जाहला. नंतर पुन्हा दोन महिन्यांनी मला पुण्यास पाठविले आणि साहेबांस सांगावे की किल्ल्यावर पेशवे यांनी माहाराजांस फार अडचण करीतात. मोठे संकटात आहेत. याचा विचार काय करावा? नंतर साहेबांस जाऊन सदरहू मजकूर सांगितला. त्यानंतर त्यांनी चिठ्ठ्या पावल्याचा मा विचारून बोलले की बाजीराव साहेब यांचा बिघाड तहप्रकरणी पेशव्यांकडून जाल्यावर माहाराजांसी दोस्ती पुरी करणे किंवा कसे, सांगणे ते सांग बोलले.
नंतर बोलणे निसरडे पाहून मी उत्तर केले की अशा सांगण्यानी बचाव कसा होईल? बंदोबस्त करून देतील हा भरवसा आम्हास फार आहे. नंतर सांगितले की बाजीराव साहेब यांनी तहाचा बिघाड करण्याचा इरादा तूर्त केला आहे. बिघाड लौकरच होईल सांगावे. फिकीर न करणे, बोलून निरोप दिल्हा. सदरहू निरोप स्वामीस व चिटणीसांस व विठ्ठलपंतबाबास कळविला. नंतर किल्ल्यावर कृष्णाबाई व नारोळकर यांजपासी सांगून पाठविला. त्याचा निरोप पुन्हा आला नाही. साा (सबब) उपाध्ये व नरसू काकडे याजसमागमे सरकारास सदरहू बातमी पावती करण्यास बाबांनी सांगून, मला परत जावे सांगितले, मी परत गेलो.
दादासाहेब बाळासाहेब व चिटणीस पुण्यातच होते. तो पुढे वैशाखमासी साहेब, यांनी पुण्याभवता पलटणचा वेढा दिला, किल्ले वगैरे घेतात असे दादासाहेबांस कळले. नंतर मजबरोबर साहेबांस सांगून पाठविले की हल्ली बाजीराव साहेबांचा व आपला बिघाड आला, पुढे कसे करता? त्यांनी सांगितले की आम्ही किल्ले वगैरे घेतले त्याची मुाा त्यांनी केली आहे. तुम्ही माहाराजांस कळवावे. नंतर मी सातारियात येऊन विठ्ठलपंत बाबांस सदरहू मजकूर सांगून किल्ल्यावर बातमी पोचविण्यास फार अडचण आहे. बाबांनी सांगितले दाजी नारोळकर व नरसू काकडे यांजपासून युक्तीने कळवतो बोलले.
मी निघून पुण्यास चिटणीसांकडे स्वामींची भेटी घेऊन गेलो. तो पुढे काही दिवसांनी बाजीराव साहेब यांनी बिघाड करून लढाई होऊन बाजीराव साहेब सासवडास गेले. त्या संधीत बाळासाहेब चिटणीस बोरगावी गेले होते. त्यास पत्र पाठवून आणविले. ते येण्याचे पूर्वी पेशव्याचा मोड झाला. पुणे घेतले. तेव्हा तेथे राहावे तो गोखले याचा निरोप चिटणीसांस आला की तुम्ही निघोन माहुलीस येणे. कागदपत्र घेऊन दादासाहेब डोणज्याचे खिंडीने सिंहगडाखालून माझे घराकडून दम खाऊन निघोन जैतापुरास आले. नंतर प्रधानपंतही माहुलीस आले. नंतर माहाराजास वासोट्याचे किल्ल्यावर नेणार कळले. स्वामीस जैतापुराहून दादासाहेब माहुलीस आले, तो माहाराजास किल्ल्यावरून पेशव्यानी माहुलीस आणिले. ते वेळी माहाराजाचे हातची हिऱ्याची अंगठी वाहोन गमावली, असे वर्तमान कळले. नंतर स्वामींची व माहाराजांची भेट होऊन पुढे माहुली मुकामाहून विचार करावा, तो प्रसंग आला नाही.
स्वामी जैतापुरीच होते तो चिटणीसांनी मजबरोबर निरोप पुण्यास साहेबांकडे पाठविला की माहाराजांस वासोट्यास नेहणार, कसे करावे व हल्ली तह बिघाड जाहला म्हणजे बंदोबस्त करून माहाराजांस राज्य द्यावे असा करार आहे. या प्रसंगी साहेबांनी बचाव करून माहाराजांस राज्य द्यावे. आज आपण कराल ते होईल बोललो. म्हणून सदरहू निरोप जैतापुरी स्वामीकडे कळावयास मुकुंदा जमलेकर याजबरोबर पाठवून मी मला पुण्यास पाठविले. मी बाळाजीपंत नातूकडे गेलो.
सदरहू मजकूर बाळाजीपंतास सांगितला. परंतु त्यांनी साहेबास कळवितो बोलले, बंगल्यास नेहले नाही. मग मी दुसरे दिवशी बडे साहेबांकडे जाऊन परभारे भेटलो. त्यांनी निरोप ऐकून खूष होऊन सांगितले की आम्ही पलटणीसुद्धा माहुलीस येणार. थोडके दिवसात बंदोबस्त होईल माहाराजांपासी काही सरमजामाची जमेत असली असता बहुत उपयोग होईल. याची तजवीज चिटणीसांस सांगावी बोलले.
मी पुण्याहून निघून रस्त्यानी येतो तो बाळासाहेब चिटणीस महाराज सरकारची खुणेची आंगठी घेऊन बोलण्यास गेले. ते निंबाच्या पारावर भेटले. त्यास सविस्तर मजकूर सांगितले. नंतर मी जातो बोलले. सविस्तर मजकूर दादासाहेबांस स्वामीस सांगावा म्हणजे माहाराजांस कळवतील बोलले व साहेबांनी विचारले की माहाराजांसच नेणार किंवा आणखी कोण्हास नेणार विचारले. नंतर मी सांगितले की माहाराजांस मातुश्री माईसाहेब व आपासाहेब महाराज व भाऊसाहेब महाराज राणीसाहेबासुद्धा नेणार. माहुलीस सर्वत्र आणली आहेत, अशी बातमी आहे.
आज उद्या रात्री नेणार बोलून मला पाच मोहरा दिल्या. त्या आणून स्वामी व चिटणीस विठ्ठलपंत बाबांपासी देऊन सदरहू निरोप माहाराजांस विठ्ठलपंत यांकडून कळविला. पुढे नंतर महाराज सरकारास प्रधानपंत घेऊन पंढरीस गेले. त्या संधीत माझी प्रकृति बिघडली. संधीवायू होऊन पाय सुजले सबब घरास गेलो. नंतर बाजीराव साहेब गेले. महाराज सरकारास इंग्रज बाहादूर घेऊन आले. त्याकाली श्रीस्वामी व चिटणीसास विठ्ठलपंतबाबांस विनंती केली तो स्वामींनी आज्ञा केली की हे राजकारण मोठे. यांजकरिता तू दहा वर्षे फार कोणापासी बोलू नये म्हणोन पेशजी शफत घेतली होती ती विसरलास की काय? स्थिर जाहल्यावर बंदोबस्त होईल बोलले. नंतर याजकरीता कसे करावे विचारले. बंदोबस्त होईल बोलले.
माहाराजांस मुखत्यारी येण्यास पाहिजेत सांगितले व पाच वर्षानंतर महाराज पाच वर्षे मुखत्यारीने वागू लागतील, तेवेळी तुझा बंदोबस्त होईल बोलले. हे भविष्य सांगितले होतेच. तो बडे साहेब करंज्याचे बागेत आले. ते काळी सर्वाचे म्हणणे पडले की आम्ही राजकारण केले. तेव्हा मी पुण्यास विश्वनाथराव यांजबरोबर गेलो होतो तेथून मला चिटणीसांनी आणविले आणि बडे साहेबांपासी भेटविले. ते काळी विठ्ठलपंत बाबा व आमात्यपंत व चिटणीस व बाळाजीपंत नातू असे होते. साहेबाने विचारले की तू चाकर कोणाचा. मग मी उत्तर केले की चाकर चिटणीसाचा चाकरी सरकारची केली आहे. ते वेळी मी विनंती केली की माझा बंदोबस्त साहेबांनी करून द्यावा.
ग्रांट साहेब यांस सांगितले की यांनी चाकरी फार केली आहे. याजकरीता बंदोबस्त द्यावा बोलले. ते वेळी कोण्हाचे पोटात काय वाकडे आले न कळे. माझे बोलणे कोण्ही बोलले नाहीत. नंतर चिटणीसांनी मला आक्कलकोटास पाठविले, तो इकडे ग्रांट साहेब गेले. पुढे दादासाहेब स्वामी विठ्ठलपंत बाबा वारले. नंतर माझा प्रवेशही जाहला नाही व स्वामींनी नेमही दहा वर्षांचा सांगितला होता सबब विनंती केली नाही. पुढे चिटणीस पंडित सुमंत यांनी अक्कलकोटास सरकारात विनंती करून पाठविले. तेथे ही बंड जाले. ते वेळी कागद धरीले. (जे मुंबईस गेले त्याचे फितुराचे कागद मी सरकारआज्ञेवरून धरीले.) हुकूम सरकारचा आला त्याप्रमाणे चाकरी केली.
बंडवाले यांनी धरून कैद करून बेडी इत्यादी संस्कार केले. हे संस्कार पेशजीचे राजकारणात हप्त्याची बाकी राहिली होती ती जप्ते यांनी केली. तेथे चीजवस्तू लुटली गेली. त्यांनी इजा केली, परंतु दम न सोडिता पेशजी आपण राजकारणात वागलो. स्वामीचे चरणप्रतापे धैर्य न सोडिता बंडवाले यासी जबाब दिल्हे. ते काळी जानराव शिर्के इकडेच होते. असा प्रसंग गुजरला, हे सर्व सरकारास माहीत आहेच आणि गवताचे लिलाव बेरोजगारी भावानी घेतला असता तोच गुन्हा सिद्ध होऊन मला बडतर्फी दिल्ही (व पेशजीसुद्धा या गुन्ह्यात) असो. माझे वतन सोडून देऊन मजपासून माहाराजांनी पायापासी चाकरी घ्यावी. मी संकटसमई सेवा केली परंतु माझा जीर्णोद्वार जाहला नाही.
आक्कलकोट मुकामी श्रीमंत राजश्री बाळासाहेब चिटणीस पंडित सुमंत यांनी विनंती पेशजीचे राजकारणांची केली. त्यावेळी आज्ञा सरकारची जाहली की दुसरे यादीस याचे नाव लिहून ठेवावे म्हणजे इनाम वगैरे मिळेल. हुकूम जाहला व दाजीबा नारोळकर व कृष्णाबाई व दाजीबा उपाध्ये यांची रुजुवातही सरकारनी बळवंतराव बक्षी यांजकडून करून घेतली. नंतर चाफळ मुकामी तीर्थरूप मातुश्री ताईसाहेब व रंगोपंत दादा व चिटणीस पंडित सुमंतही बोलले बंदोबस्त करून देतो. आज्ञा जाहली. परंतु मी देव ही जे काही देत नाही (मला जे काही द्यायचे ते तर दिलेच नाही) व कच्चा मजकूरही सरकारात कळला नाही.
सबब ही अर्जी सरकारनी मनन करून वतन सोडून देऊन मला चरणापासी जागा देऊन चाकरी घ्यावी. अक्कलकोटी धाकटे भावाचे लग्न जाले. त्याजबद्दल कर्ज चारसे सवाचारसे जाहले आहे. त्यास माझी चीज वस्त येणे त्यापैकी तीनसे रुपये साहेबांनी दिल्हे. बाकी येणे ते देण्याचा हुकूम जाहला पाहिजे. मला नित्य मुजऱ्यास येण्याची परवानगी जाहली म्हणजे संधी पाहून वतनप्रकरण विनंतीही करीन. मी चाकर सरकारसेवा करण्यास मजकडून अंतर होणार नाही. परंतु मला ही दशा प्राप्त जाहली. त्यातून काढून माझे संरक्षण करणार महाराज समर्थ आहे. ही जिकीर सरकारास वाटेल. परंतु जाले राजकारण कळले पाहिजे सबब विनंती लिहिली आहे.
हे प्रकरण बहुत दिवसाचे. लिहिण्यात कमजास्त असल्यास माहाराजांनी कृपा करावी. कारण वेळेचे स्मरण बहुता दिवसामुळे राहिले नाही. हाली कोण्ही माझे बोलणे बोलून बंदोबस्त करून देवितील असा भरवसा वाटत नाही. सरकारनीच कृपा करून बंदोबस्त करून दिल्यास होईल. नाहीपेक्षा दारिद्यांनी व्यापिले आहे. तरी स्वामींनी सेवा घ्यावी. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना मि कार्तिक शु ९ रोज सोमवार शके १७५३.
माझी सरकारात ओळखसुद्धा नाही असे जाहले आहे. माझे बोलणे स्वामीपासी कोण्ही बोलून बंदोबस्त करून देविवतील असा भरसा वाटत नाही म्हणोन विनंती लिहिली सेवेसी श्रृत होय हे विज्ञप्ती.
(६) प्रतापसिंहाची ८ पत्रे.
पत्र १ ले.
आप्पासाहेब भोसले आपली धाकटी बायको घेऊन सातारा रेसिडेन्सीत राहायला गेले. त्याबाबत प्रतापसिंहाने शिर्के नि भगवंतराव यांना पाठविलेले पत्र. (ता. १० मे सन १८३९) अस्सलवरून ठाकरे यांनी केलेली नक्कल.
श्री
शिर्के व भगवंतराव.
यादी स्मरणार्थ मार (मजकूर) हाली चिरंजीव आप्पासाहेब हे रसिदंटाचे बंगल्यापाशी उतरले आहेत. तेथे आपले धाकटे कुटुंबास घेऊन गेले. आज ती थोर वयाची आहेत असेही नाही. ही गोष्ट आमचे लोकात चांगली नाही. वडील घरचे कोणी आसल्याखेरीज कुटुंब नेण्याची चाल नाही. हाली बालाजीपंत नातू व रसिदंट आपले जवळ आसता, तुम्ही आपले रिवाजाप्रो करा, आसे न बोलता होऊ देतात. हे आमचे धर्मास नीट नाही. हिंदुस्थानात वगैरे आमचे ज्ञातीचे लोक आहेत.
तेथे व मुसलमान लोकातसुद्धा जनानखान्याविसी ही चाल नाही. आसे आसून हाली आसे जाले. त्यास रसिदंट यास माहीत नाही आसे म्हणावे, तर जेव्हा यांनी आकस्मात नेले तेव्हाच रसिदंटानी यास तुम्ही बेहिसाबी केले, आसे म्हणून परत पाठवून देते म्हणजे खरे. परंतु चिरंजीव त्यांजपासीच आहेत. तेव्हा त्यास कलविल्याखेरीज केलेच नसेल व जे गेले आहेत त्याची चाल घराऊ चालिविसी कसी आहे. ही ल्याहावी आसे नाही. सर्वास जाहीर आहे. आसे असून जी मंडळी गैरचालीस रुकार देणार, त्याचे हे ऐकणार. तेव्हा यास आपले कुळाचे चालीची गरज नाही व यास इंग्रजी सरकारचे कामगार रुकार देणार व कुलाचा व लोकांचा नाश करून, आपण निराळे राहून, तमाशा पाहाणार. आसे आनेक प्रकारचे तऱ्हेने द्वेष करणार.
एविसी इकडून काही कमपेश जाहाले म्हणजे आदावत सजविणार. व पेशवे याचे कारकीर्दीत अनेक तऱ्हेचे प्रकार त्यांनी केले, परंतु द्वेषामुळे आशा गैरचालीच्या गोष्टी इकडील कुलासी व ज्ञातीसी देखील केल्या नाहीत व होऊ दिल्ह्या नाहीत. व पेशजी सातारा किल्यावरून चतरसिंग राजे बाहेर पडले ते वेलेस त्यांचे कुटुंबासुद्धा इकडील तीर्थरूपानी जाऊ दिल्हे नाही व ते प्रौढ आसता व तीर्थरूपाचे आज्ञेप्रो वागणुकीची खात्री आसता त्यांनी आपल्या रीतीस बाध एऊ नये म्हणोन लस्करात पाठविले नाही व त्यांनीही नेले नाही. हे सर्व लोकास माहीत आहे. त्यास आशा गोष्टी जाहल्या.
परंतु हाली इंग्रजी सरकारचे दोस्तीत फरक येऊ नये याजकरीता सबुरी केली. नाहीपेक्षा हुरमतीहून अधिक कोणता लोभ आहे आसे नाही. त्यास इंग्रजी सरकारातून आसे करविणाराचे बंदोबस्त नसीयतेनसी(?) जाहाले तरच कोणतेही करण्याचा उपयोग. नाहीपेक्षा लोभामुळे त्याहावे असा अर्थ इत:पर राहिला नाही, इतःपर राहिला नाही, आसी अक्षरे कोणत्याही कारणास्तव लिहिण्यात आली नाही. परंतु हाली लिहिणे आले. सा (सबब) लिहिले. व येक थोरले कुटुंब येथे हाली आहेत. त्यास इकडून आटकाव नाही व त्यांनीही का नेले नाही हेही एकडून विच्यारीले नाही. व कोठे देवास व स्वारीत वगैरे कुटुंबे आसली तर प्रौढ़ मनुष्य आपले चालीस वाकफगार आसा नेमून बंदोबस्त राखून करणे आसी वहिवाट व तसेच बायकाही प्रौढ आप्त वगैरे व दुसऱ्याही आसल्या तत्रापि आशा, आसी चाल आजपर्यंत चालत आली.
ती आज इंग्रजी सरकारचे कामगारांनी आपली आकल व हुरमतीप्रो मानून इकडील कुळाचा मोठेपणा काही न ठेविता आसे केले. त्यास येविसीचा जाबसालही कलमापेक्षा आधिक आहे. त्यास इंग्रजी सरकारतून येविसीचा बंदोबस्त करून घेणे प्राप्त, तर साऱ्या गोष्टीचा उपयोग आसे चाल सोडून गैरचालीने वागणार आसे सला देणार त्याची गोष्ट इनसाफास आम्ही व जे चालीचे लोक आहेत ते पसंत करणार नाहीत. व इंग्रजी सरकार तरी गैरचालीचे लोकास आजपर्यंत पसंत करीत आले नाहीत. व गवरनर साहेबही रीतीचीच गोष्ट पसंत करतील, हे तुम्हास कळावयाकरीता लिहिले आहे. याचे पुरे मनन होऊन जबाब यावा. व यापरती आणीक सबुरी करण्याची मर्यादा कोणची राहिली व मुदेही पदरी यापरते घालणे कोणचे व मुदे पदरी घालून इनसाफ होणे तो कोणता राहिला... खुद तारीख १० मे सन १८३९ इसवी.
पत्र २ रे.
अस्सल बरहुकूम नक्कल, ठाकरे.
श्री
राजश्री भगवंतराव विठ्ठल यासी आज्ञा केली ऐशीजे तुम्ही पेशजी तारीख ५ नवंबरचे पत्र कलकत्यास पावल्याचे व हली तारीख २१ नवंबरचे पाठविले ते, आसे दोन पत्री मजकूर लिहिला. तो सर्व हुजुरात श्रुत जाहला. साने याचे तर्फेनी परशरामपंत याणी तेथे तुम्हास तहकुब होण्याविसी सांगितलेवरून तेथे राहिल्याचा मजकूर लिहिला तो कलला. तयांस येविसी साने यास प्रथम सांगणे होते. परंतु पुढे साने यास तुम्हास तहकुब न करण्याविसी पत्र गेले. तो साने इकडे निघोन आले. याजकरिता हली हे आज्ञापत्र सादर केले आसे. तरी पत्र पावतांच तुम्ही हुजूर निघोन येणे जाणिजे छ १३ सवाल सुद इसने आर्बन व आलफ खुद तारीख २७ नवंबर सन १८४१ इसवी.
श्री
शिक्का मर्यादेयं
अष्टकोनी प्रकाशते
ता. ७ दसंबर सन १८४१ इसवी.
कार्तिक वा ९ मंगलवार शके १७६३ (भगवंतराव विठ्ठलच्या हातचा शेरा.)
छ २१ शवाल मु. कलकता बडा बाजार.
पत्र ३ रे.
अस्सलबरहुकूम नक्कल, ठाकरे.
श्री
सीर्के व भगवंतराव
विनंती उपरी. आकलकोट प्रकर्णी इंग्रजी सरकारातून याद आली की माहाराज सरकारचे कामगार आकलकोटास आहेत. त्यांनी शाहाजी भोसले यांचे स्वाधीनं मुख्त्यारी करून पावती घेऊन परत यावे, आसे कौसलचे नजरेस आले म्हणोन लिहिले आहे. त्यास येविसीचे पर्याय कसे आहेत तेविसीची कलमे.... .बि (बितपशील).
१. येथील रसिदंटानी व नातूनी भोसले याजकडून आर्जी देऊन तेथे कारकूनही नातूकडील पाठवून सारा क्रम आपणच करून हली कौसलातून हुकूम आला. कौसलचे नजरेत आले आसे लिहितात. याजवरून पाहवे की सारी क्रुत्यें आपणच उभी करून सिध्धतेस आणावी आणि आपण वेगलेपणा दाखऊन करण्याचे भाव नातूनी आलक राहून चालविले आहेत, हे पाहावे, येविसी पेशजी लिहिलेच आहे की आपण येकीकडे राहून लोकाकडून क्रुतीचे दस्तऐवज करऊन रुजवातीसु (सुद्धा) करवितील. आशा चालीस खरे कसे मानावे व मंजूर कसे करावे म्हणून पेशजी लिहिलेच होते. त्यास या करण्यावरून उघडच दिसत आहे की आसे प्रकार त्याचे करण्याचे. याजवरून त्यांनी तुफानी रचना कशा उत्पन्न केल्या हे पाहवे.
२ हली याद आली त्यात आकलकोटकराचे स्वाधीन करावे आसे लिहिले आहे त्यात आकलकोटकराकडील मुलुक इकडील हदीबाहेर आहे. परंतु तेविसीं इंग्रज हदीतील वगैरे आसे काही तर्कटी संशय लिहिले नाहीत. याजवरून सचिवांचे हदीचे खटले उपस्थित केले, ते उघड त्याचे लिहिण्यावरूनच दिसत आहे. येविसी लेख व वहिवाट साफ आहे. कोणी खरे पाहिले म्हणजे त्याचे नजरेस येईल. परंतु हे तूर्त मनातच ठेवावे. प्रगट करावयाचे नाही. कारण पडेल तेव्हा पाहता येईल. या प्रो सर्व मार (मजकूर) सिवेबाचे (बद्दलचे) ध्यानात आणून घ्यावे.
३ इकडील मंडली आकलकोटास होती ती येऊन हली इंग्रजी सरकारचे कामगार आहेत. त्यास दरमाहा आहे ते आबा जोसी ११०, दाते नातूकडील कारकून ११० व श्रीधरपंत ५५ व शास्त्री १३० येकूण च्यारशे पांचखेरीज संत्री आसामी काही आहेत. त्यास भत्याबा पडले आसे आहे. पेशजी बोलण्यात आसे होते की माहाराज सरकारची मंडली जे वेलेस निघेल ते वेलेस इंग्रजी सरकारचेही लोक निघतील. आसे आसता इकडील निघून तिकडील आहेत, ते सदरी लिहिले आहे. याखेरीज पेशजी इंग्रजी सरकारचे लोक व साहेब लोकास भत्ता किती पावला तेविशीचे तपसिलाचे मागाहून लिहून पाठविता येईल.
४ हली इंग्रजी सरकारातून याद आली व तिचा जबाब इकडून पाठविला. एकूण दोनी यादीच्या नकला पाठविल्या आहेत त्याजवरून कलेल.
५ तुमचें जाण्यापूर्वी आसे वरचेवर आधिकोत्तर गुजरत चालले आहे. हे सो (सर्वानी) मनात आणून जितके जलदीने निघोन जाल तितके चांगले, तुम्ही गेल्यानंतर इकडे सक्ती जाली तरी सोसीतच आहो. परंतु सारे बंदोबस्त एकदाच उलगडून लवकर येईत आसे करावे. यविसी सर्व मार (मजकूर) उलमारसाहेबास कलऊन याचे उत्तर काय ते विच्यारून लिहून पाठविणे.
येकूण पाच कलमे लिहिली आहेत. त्याजवरून कलेल. *छ २१ जिल्हेज खुद तारीख ८ मार्च सन १८३९ इसवी हे विनंती.
(*येथून अक्षरे प्रतापसिंहाची आहेत.)
पत्र ४ थे.
[अस्सल]
[१०] मे १८३९
श्री
सीर्के व भगवंतराव
यादी स्मरणार्थ मार चिरंजीव राजश्री आप्पासाहेब माहाराज चैत्र शु।। १० शके. १७६१ या रोजी येथून निघोन बंगल्यास गेल्यानंतर याणी आपला जिनस जिनसाणा नेहला व परत पाठविला. त्याविसी इकडे विच्यारले नाही व इकडून सांगणेही जाहले नाही. व त्याची मंडळी इकडे बोलावयास वगैरे कोणी येत नव्हती. परभारा वाड्यात येऊन जात होती. हाली वैशाख या ८ सोमवारी सखाराम बल्लाळ व वासुदेव कृष्ण माहाजनी येऊन सरकारात विनंती केली की आप्पासाहेब माहाराजानी विनंती करण्यास सांगितले की आमचे धाकटे कुटुंब तिकडे न्यावयाचे, येविसी सरकारात व पहिल्या वाड्याकडे विनंती करून घेऊन यावी. त्याजवरून आज्ञा जाहाली ती कलमे...... बि
१ तुम्ही आम्हास विच्यारावयास पाठवावे असे ठेविले नाही.
२ तुमच्या दोघी बायका न्याव्या आथवा ठेवाव्या.
३ इकडून तुम्हास सांगावे असे राहिले नाही.
४ तुम्ही करणे ते कुळसीळ आपले पाहून करीत नाही.
५ जे करिता ते रसिदंट याचे विच्यारेच करीत आसाल.
येकूण पाच कलमे हा मार इकडे विच्यारणे तर रसिदंट याणी विच्यारावे आथवा आपासाहेब याणे विच्यारावे. त्यास उत्तर करू. तुमची हा मा।र विच्यारावयाची योग्यता नाही. याप्रमाणे माार सखाराम बलाळ यास आज्ञा जाहली. नंतर विनंती करून खोली बाहेर गेले. त्याजवर उभयतास बोलवावे म्हणून निळो आबाजी भडकमकर यास सांगितले. त्याजवरून भडकमकर बोलवावयास गेले. तो येकटे सखाराम बलाळ होते.
वासुदेवपंत कोठे आहेत म्हणोन भडकमकर याणी विच्यारले. त्यास उत्तर केले की परसाकडे गेले आहेत असे सांगितले. त्यास वासुदेव कृष्ण वाड्याबाहेर जाऊन जलद आले. बंगल्याकडे जाऊन यावयास आवकाश फार पडतो. साा नातु आभ्यंकराचे येथे आहेत, तेथे जाऊन माार विच्यारून परत आले. व तेथे येशवंतराव फौजदार बसले होते. व वासुदेव कृष्ण जर्दा घोड्यावर बसून नातूकडे गेले होते असे लोकानी पाहिले. नंतर वासुदेव कृष्ण यास विच्यारिले की तू माार विच्यारून आलास किंवा कसे, याजवर वासुदेवपंत सखाराम बलाल याचे रुबरु बोलले की आपासाहेब माहाराज याणी सांगितले की या माारचे उलगडे तुमच्याने होणार नाहीत. रवानगी करीत आसल्यास घेऊन यावे म्हणोन सांगितले असे बोलले. याजवर त्याजपासी आज्ञा जाहाली की पाहिजे तसे करावे.
आणखी उभयता पासी सांगितले की या मााचे कारण पडल्यास रुजुवात करावी लागेल असे सांगितले. व पूर्वी वासुदेवपंत कोठे आहे असे विचारिता परसाकडे गेले म्हणतात व सरकाराजवळ आम्ही विच्यारावयास कसे जावे, आज्ञा जाहाली तर जाऊ म्हणतात. पुढे विच्यारून आलो म्हणतात. याजवरून पाहावे की आशा स्वभावाची माणसे जमा केली आहेत, ती कोणते कारणावरून काय करतील याचा नेम नाही. व नातु काल आले आणि आज हा मार जाहाला. तेव्हा करण्याचे भाव कसे आसतील ते याजवरून पाहावे. सदरहूप्रो मार जाहाल्यानंतर आपासाहेबाकडून हाती व तुरूपस्वार व सिबंदी व हुजरे व मानकरी वगैरे येऊन घेऊन गेले व त्याजकडील आस बाब सुद्धा उंटावर घालून घेऊन गेले. छ २५ सफरदुप (?) तारीख १० मे सन १८३९ इसवी.
पत्र ५ वे.
[अस्सल]
आजिमुषान सर च्यारलीस फारबस साहेब बाहादूर बादकामबाषंद
र्छ षाहमत व अवालीपन्हा शफकत दस्तगाहा... बादन षौंके मुलाका तमष हुद अके दिगर इकडील आहावाल आजपर्यंत बेनाहग इंग्रजी सरकारचे कामगारानी इकडील मोठेपणा व चाल वगैरे कोणतेच मनात न आणिता कोणते मजलीस आणिला, ते परभारे व मिलन डाकतर साहेब याणी तेथे लिहिले. त्याजवरून असाहेबाचे ऐकण्यात मजकूर अलाच असेल. व सैयद मीर अगाऊ पुढे गेले ते असाहेबास भेटून सर्व जाहीर केलेच असेल.
त्यास या देशात इकडील मुख्यत्व कसे आहे हे सर्व असाहेब जाणून आहेतच. त्यास इकडून त्या मुख्यतेचे वगैरे काही मनात न आणिता फक्त इंग्रजी सरकारची दोस्तीची खाहीष ठेऊन पुढेहि दिवसे दिवस दोस्तीची परस्परे वृद्धी असावी हाच इरादा असता, इंग्रजी सरकारचे कामगारानी हालके द्वेशी तर्कटी लोकाचे समजाविणे खरे मानून, त्याचा विच्यार न पाहता, इकडील मोठी मोठी अब्रूदार माणसे नेऊन त्याचा दस्तऐवज वगैरे काही नसता बे नाहक इकडील मगदुरास कमी करून त्या माणसास अटक करून त्याचा बेअवजन जाहीर होण्याकरिता मोठा वहमा दाखविला, त्यास तेथे तेविसी आजपर्यंत बोलले असता व लेख पाठविले असता काहीच जबाब न मिळाला.
सबब डाकतर मिलन साहेब याचे हातेही येथे व कलकत्ता विलायतेस जाहीर करविले. परंतु कोणतेच उत्तर न मिळाले. सबब हाली पेशजी पासून आजपर्यंत इकडे कस गुजरविले त्याचा अहवाल येथे सरकारात सर्व ठिकाणी बादषाहा पर्यंत जाहीर व्हावा, सबब राजश्री येशवंतराव राजे सीर्के भगवंतराव विठ्ठल वगैरे मंडळी उलमार साहेब याजबरोबर कैफियत सुद्धा कागदपत्र देऊन पाठविले आहेत, त्यास असाहेबाचा मोठेपणा व असाहेबानी पेशजी मोठे मोठ्यांची वाजवी कामे शेवटास लावली हे ऐकोन ही मंडळी असाहेबाकडे पाठविली आहे.
हे सर्व जाहीर करतील याचा तेथे मगदूर राहून सर्व ठिकाणी याचा अहवाल कलेल असे करणे असाहेबाकडे आहे. सयद मीर याजबद्दल असाहेबास पेशजी इकडून पत्र पो आहे त्याजवरून मार कलेल. त्याप्रमाणे इकडील सर्व व्येवस्था राखणे असाहेबाकडे आहे. सैयद मीर व उलमार साहेब प्रथम प्रथम आले परंतु बोलणेविसी व कागदपत्राचा मेळ येकच आहे व तारीख छ १७ जिल्हेज सुा तिसा सलाशीन मयातैन व आलफ.
जियादे चेजवी षतषवद
मर्यादेयं
विराजते
पत्र ६ वे.
[अस्सल]
[ता. १ एप्रिल १८३९]
श्री
यादी स्मरणार्थ पंधरा कलमाचे यादीत सला घेण्याचे कलम लाडउईक साहेब बोलले. याची नावनिसी आपासाहेब व सेनापति व दिनकरराव मोहिते सेनाकर्ते या तिघाचा सला घेत जावा हा अभिप्राय. त्याजवर इकडून उत्तर जाहले की पेशजी इंग्रजी सरकारची दोस्ती केली, तेव्हापासून कोणाची सला न घेता मुख्त्यारीने जिवावर उदार होऊन केले.
पुढेही कर्णे जाहल्यास आसे करू. नाहीपेक्षा तुम्ही करावयास आहाच. यावरून सेनापति यावर त्याणी आम्हाप्रोा हली ठपका लावीतंच आहेत व सेनाकर्ते नेऊन ठेविलेच आहेत. त्यावरून ते मतलबास आनकूल जाहाले नाहीत, साा ठपका ठेवीत आहेत असे आसेल, किंवा येकाचेच नाव घ्यावे तर आम्हास संशय येईल, याकरिता त्रिवर्गाची नावे घेतली.
हाली या पैकी आपासाहेब यास लोभ दाखवून फितऊन नेले आहेत. तेव्हा ते बोलण्याचे कलम व आमचे दिलातील आभिप्राय, याजवरून तो मुदा इंग्रजी सरकारचे कामगाराकडे शाबूद जाहाला, सा तोंडजबानीचे जाबसाल आम्ही खरे मानीत नाही. सरहादीचे खटले उत्पन्न करण्याचे पूर्वीच हे तुफानी अभिप्रायाचे साधन करीत होते, आसे साफ या कृतीवरून उघड दिसते, आसे तरजम्यात व्हावे. येविसी अभिप्राय द्वेशी लोक आरो करतील म्हणोन पेशजीच लिहिले आहेत.
जबरदस्त सरकारापुढे उपाय काय? तेव्हा जे रुकारास आनकूल करून घेतले ते या कृतीचेच आहेत व पुढेही आनकूल करून घेतील ते अशाच प्रकारे करून घेतील. व क्यामेटीत साहेब लोक होते तेच या कृत्यास आनकूल व रसिदंटही त्या पैकीच होऊन आले. तेव्हा इकडून इंग्रजी सरकारचे कामगारावर यापरता कृत्रिम करून तुफान करण्याचा मुदा शाबूद, दुसरा आर्थ राहिला नाही. छ १६ मोहरम दुप तारीख १ आप्रेल सन १८३९ इसवी.
पत्र ७ वे.
[अस्सल]
आजीमुषान कर्नेल राबर्टसन साहेब बहादूर षाद कामबाषंद
शाहामत व अवाली पन्हा शफलात दस्त गाहा... बादज शौक मुलाकात मशशहूद आंके येथील खैरियत तसऊर करून आपली शादमानी कलमी करीत असावी दिगर हाली भगवंतराव विठ्ठल यास इंग्रजी सरकारात इकडील मजकूर बोलण्या करिता पाठविल आहे व पेशजी आसाहेबासही दाकतर मिलन साहेबानी मजकूर कंपनी सरकारात कलविण्या करिता सांगितलाच आहे. त्यास मशारनिल्हे भगवंतराव यास कारण पडेल ते विसी आसाहेबास कलवितील. यास्तव आसाहेबास जाहीर होण्या करिता लिहिले आहे व तारीख १६ रविलावल सुा तिसा सलासीन मयातैन व आलफ जियादे जायाम षादमानीव्बाद.
पत्र ८ वे.
बादषाहा इंग्लीस्थान सरकार यांस
प्रतापसिंह माहाराज
छत्रपति सरकार
संस्थान सातारा यांचे
जिनत अफजाय औरंग सलतनत... दिगर इकडील मजकुराचे पत्र व येकंद(र) माार दिलात येण्याकरिता तरजमा अलाहिदा येशवंतराव राजे सीर्के व चिटकोजी सूर्वेराव व महंमद हुसेन डाकतर व भगवंतराव विठल याजबरोबर दिल्हेच आहे. हाली लिहिण्याचे कारण जाणाराची नावे चौघाची त्या पत्रात लागली नव्हती, सबब लिहिले आहे. जात्फताबे सलतनत व कामरानी व नैयरे जाजजानमतव जफहाजबानी सातजावलात बाद.
मर्यादेयं
विराजते
(७) सातारा येथे बळवंतराव चिटणीसाला अटकेत कबुली जबाबाची नातू सल्ला देतो. (नीळकंठराव प्रल्हाद प्रभूने रंगो बापूजीला लंडनला पाठविलेली दस्तुरखुद्द माहिती.)
राजश्री बलवंतराव मल्हार चिटणीस पंडित सुमंत यांस कैद केल्यावर पुण्यास नेण्याचे पूर्वी चिटणीस याजकडे बाळाजी पंत नातू जाऊन, लोभ व स्नेहभाव दाखवून, मनातील कपटपणा दुसरियाचे नजरेस न यावा (अशा) मोठ्या प्रौढीने बोलले की. -
नातू – बाळासाहेब, जे खरे असेल ते सांगावे आणि आपण मोकळे व्हावे. येविषयी मी रेसिदंट ओव्हन्स साहेबापाशी बोलेन. परंतु आपण राजधारणी पेचांत राहून टपका शिरावर घेऊ नये, असे मला वाटते.
चिटणीस - आम्ही फितूर केला नाही. हबशीयाचा मजकूर तर तो तुम्हास माहीतच आहे. त्या कामात तुम्ही आहातच. व सचिवाकडील मुलुकांस मावळगांवी हबशियाचा हल्ला येणे, त्याविषयी त्याचा कारकून तुमचे मागे फिरत होता, ते इंग्रजी सरकारांत सदरहू मजकूर जाहीर करून बोलत होते. व आपणही सरकारचे कामगार आहां, व बाळाजीपंत किबे व तुम्ही रेसिदंट लाडउईंक साहेबास मजकूर कळविलाच असेल. आम्ही तुम्हास व किबे यांस सांगितले की सदरहू मजकुराची खबर रेसिदंटास द्यावी. त्याप्रमाणे जाहीर आहेच. यात फितुराचे राजकारणी काही संबंध नाही, दादा, तुम्ही सचिवास कर्ज देऊन, त्याचे कारभाराची मुख्त्यारी करून, नवीन तंटा सरहद्दीचा तुम्ही उत्पन्न करून, महाराज सरकारचे व कंपनी सरकारचे (मध्ये) मोठे तेढ वाढविली, आणि या द्वेषानी आम्ही काहीएक फितूर न करिता व आमचा दस्तऐवज नसता. उगीच गळी पडून विचारितां, हे आश्चर्य आहे.
नातू - महाराज सरकारनी व गोविंदराव यांनी फितूर केला म्हणोन कबूल होऊन दोघानी लिहून दिले. त्यास आपण मात्र सारे माथ्यावर घेऊन जिदीस कशास येता? तुमची कळकळ मला फार वाटती. मी बाजीरावसाहेब याचे वेळचा. मजकूर सर्व आपणास माहीत आहे. तुम्ही त्या राजकारणास उभय सरकारचे बोलण्यात वागला. तेव्हा बापू गोखले यांनीच मोठेपणा दाखवून, आपले डोईवर सारे घेऊन, शेवटी आपले समक्ष लष्करांत प्राणांनिशी गेले. असे प्रसंग दृष्टीनी पाहिले आहेत. याजकरीता मी आपणास बोलतो.
चिटणीस - दादा, तुम्ही व आम्ही माहितगारच आहो, महाराज सरकारची व इंग्रज सरकारची दोस्ती आम्ही करून दिली. त्या दोस्तीने कंपनी सरकारांत फायदा कसा जाला तो तुम्हास माहीतच आहे. मिस्टर एलफिस्टन साहेबांनी भरवसा व वचन दिल्हे व तुम्ही शफतवचन दिल्हे. त्याचे स्मरण न राहता, पुढे कसा प्रकार जाला तो तुम्हास माहीतच आहेच. ते वेळेस दादा, तुम्ही आम्हास विसरून कंपनी सरकारात काय मजकूर कळविला, तो तुम्हास माहीत असेलच. पुढे तहनामा जाला. त्याप्रमाणे व दस्तऐवजावरून चालते वहिवाटी विषयी महाराज सरकारातोन बोलत असतां, कर्नल लाडउईक साहेब रसिदंट यास तुम्ही व बाळाजीपंत किबे माहीतगार असता. कसा मजकूर समजाऊन तेढ आणलीत आणि त्या साहेबास दुराग्रही करून दाखविलेत? सचिव याचे मुलखाचे सरहदीचे खटले करविलेत व शेख मिरा याचे जहागिरीची जप्ती पुण्याचे एजंट याजकडून करविली व खोटी फितुराची तुफाने उत्पन्न केली, व खोट्या तुफानास तुम्ही मिळोन मोठेमोठे साहेब लोकांस भर देऊन उगीच जिदीस आणिले, महाराज सरकार यांनी व गोविंदराव यांनी कबूल होऊन लिहून दिले म्हणावे, खोटे बोलावे, हे तुम्हास योग्य नाही. खोटे तरकटी लोक व दुष्मानी करणारे लोक तुम्ही मदत घेऊन बोलता आणि तुम्हीच खरे म्हणता? महाराज सरकार व आम्ही बोलतो हा खरा मजकूर असतां, त्यास तुम्ही खोटे म्हणता. हा विचार तुम्हीच करून पहावा. गोखले याचा दाखला आम्हास सांगता. त्यास पेशवे बुडवून टपका तुम्हीच घेतला. हल्लीही महाराज सरकारचा टपका तुम्ही आपले शिरावर घेण्याची इच्छा बाळगता, हे मला फार वाईट वाटते. परंतु कंपनी इंग्रजी सरकार आदल इनसाफी व धर्मनीतीवंत व त्याचे दस्तऐवज व अशी खोटी तुफाने उत्पन्न केली ती निर्दोष होऊन दोन्ही सरकार एक होतील ही खात्री ठेवावी. त्यासमई तुम्हासारिखे लोकांची मात्र कटकट फार वाटती. इनसाफ न जाल्यास, तुम्ही पाहिजे तसे करीत आहा, मग मात्र लाचारी.
येणेप्रमाणे उभयतांची बोलणी परस्परें जहाली. ती विस्तार होतो सबब सदरहू हशील लिहिले आहे. बाळाजीपंत नातूनी असे खोटे तरकट करावे आणि इंग्रजी सरकारानी ऐकावे. असो सदरहू मजकूर गव्हर्नर जनरल साहेबास व विलायतेस डिरेक्ट कोर्ट साहेबास जाहीर होण्याकरीता लिहिला आहे. ता. १५ आक्टोबर सन १८३७, सही नीळकंठराव प्रल्हाद प्रभू हस्ताक्षर खुद्द मु० मुंबई.
(८) छत्रपतीचा पारलमेण्टला अर्ज नं. १
प्यारलेमेंट यास
प्रतापसिव्ह माहाराज
छत्रपति सरकार
संस्थान सातारा
मुरबा अनिषी नाने चार खालिप सदारत व हषमत जिनत आफ जायान आकलीले सलतनत जुब्द गाने नौबिनोन अलिपान मुसीरोन खासेपाहे इंग्लिस्थान हौस आफ लाईन बहादुरान जाद हषमत बादल गुलदस्त बंदीय गुलहाय इश्तियाक व अवधारी गुलंजारे आपवाक मकबुफ जमाईरेसदालत जखाई ईर गर्दानिदः मी अयद येथील खैरीयतय तारीख छ २३ साबान सुरुसन तिसा सलसीन मया तैन पावेतो तसकर करून आपली पादमानी कलमी करीत असावी दिगर. इंग्रजी सरकारचे व बाजीराव याचे लढाईचे मोकदम्यात बाजीराव व इकडील स्वारी फौजेत आसता नरसू जामदार याचे हाते इलफिस्तन साहेबाचा निरोप इंग्रजी फौजेत येण्याचा आला.
त्या संकेताप्रमाणे जनरल स्मित साहेब यांचे लष्करात आम्ही आल्यानंतर संकेताप्रमाणे आलो म्हणोन बाळाजी नारायण नातु, यास चिटी इलफिस्तन साहेब पुरंदरचे मुकामी असता पाठविली. पुढे लष्करात इलफिस्तन साहेब याची भेट झाली. ते वेलेस रसूल (रसेल) साहेब यास लाट साहेबाकडे पाठविण्याविसी मजकूर इलफिस्तन साहेब बोलले. व त्याणी रसेल साहेबाची इकडेहि समक्षता केली. ते वेलेस इकडून उत्तर जाले तेविशीचा मजकूरही सर्व इलफिस्टन साहेब यास माहीत आहे. पुढे तहनामा होण्यापूर्वी इकडील मजकुराविसी पत्र इलफिरतन साहेब पुणे मुक्कामी असता लिहिले होते. त्याचा जबाब इकडील खात्रीकरिता पेशजीचे सर्व भाव मनात आणून इलफिस्तन साहेब वाणी इकडे पत्र लिहिले. त्यात आहे की फिदवी लोकानी ठेविले तसे न होता व वरकड संस्थानिकाहून कमती न करिता व माहराजाचे खानदान व खुसी राही असा बंदोबस्त लाट साहेब करतील आसे पत्र सन १८१८ इसवी सप्टेंबर महिन्यात आले. पुढे तहनामा जो त्याणी पाठविला तेविसी ग्रांट साहेब याणी सांगितले की माहराजानी इंग्रजी सरकारावर भरवसा ठेऊन तहनामा पुरा करून घ्यावा. त्याजवरून इंग्रजी सरकारची खात्री जाणून मुकरार केला, तेविसीचा मजकूर इलफिस्तन साहेब व ग्रांट साहेब यास माहित आहे. व हेच मनात आणून इलफिस्तन साहेब मुंबईस गवरनरीचे कामावर गेल्यानंतर जाहागिरदार तहनाम्यातील व सेख मिराही त्याप्रमाणेच लाऊन दिल्हे, व नवीन पेशवे याणी जाहेगिरी जशा इंग्रजी सरकारच्या हादीतील इंग्रजी सरकारात येतील.
तशा इकडील हादीतील इकडे येण्याविसीचे पत्र व इकडील जाहगीरदार याचे निवेश जाहल्यानंतर त्या जाहगीरा इकडील. व इलफिस्तन साहेब आसता जाहगिरदार यांचे मुलूक इंग्रजी सरकारचे हधीतील त्याचे मोबदल्या विसी इकडून सांगणे जात होते तसे ठरण्यात येत होते. व जाहगीरदारा कडील फिर्यादी वगैरे इकडेच मनास आणणे असी वहिवाट होती. व तहनाम्यात जाहगिरदाराचे मुलकाचे मोबदल्याचे कलम लिहिले आहे. त्यात आहे की माहराजाचे मुलका लगत आमल होण्या करिता मोबदला केला जाईल आसे लिहिले आहे यातील भाव हाच आहे की जसा इकडील खालसाती (ल) मुलुख तसाच जाहगिरदार याचा मुलुक इकडील, सबब इकडील मुलका लगत, आसे लिहिले आहे.
इकडील नसते तरी आसे ल्याहावयाचे कारण नव्हते. आसे आसता पुणे मुकामी सरहद्दीच्या दिकती इकडील देसी लोकानी इंग्रजी सरकारचे कामगारास समजविल्या वरून वहिवाटीत खलेल आणली. याचे कारण समजाविणार लोकानी इकडील जाहगीरदारास कर्जाऊ ऐवज देऊन व्याज व नफा व इनामगाव व करभार व असाम्या करून देणे व घेणे ते इकडून बंदोबस्त आसला तरी साधणार नाही. हे मनात आणून इंग्रजी सरकारचे कामगारास समजाऊन खटला उपस्थित केला, तेविसी गौरनक क्लेर साहेब याजपासी इकडून मार बोलण्यात आला. ते वेलेस गौरनर क्लेर साहेब व कौसलवाले सदरलेन साहेब याणी सांगितले की येविसीची माहीतगारी इलफिरतन साहेब व ग्रांट साहेब व करनेल राबि (न) सन साहेब यास आहे. त्यास माहराजानी पत्रे ल्याहावी.
त्यावरून त्या त्रिवर्गास पत्रे लिहून रवाना करण्याविसी रसीदंट लाडउईक साहेब याजपासी दिल्ही. ती त्याणी विलायतेस कोर्ट आफ डरेक्टर्स याजकडे पाठविल्यानंतर कोर्ट आफ डरेक्टर्स याणी पाहून ती पत्रे परत इकडे पाठविली आणि विसीचा जबाब मुंबईस लिहिला. त्यात राजे लोक यानी दुसरे साहेब लोकास सरकारी कामाकरीता पत्रे त्याचे सलेविसी व पुरावा व्हावा म्हणोन लिहिले ती पत्रे आम्ही त्या साहेबास द्यावी हे युक्त दिसत नाही, म्हणोन ती पत्रे माघारी पाठविली आहेत. ती माहराजास देऊन श्रुत करावे की त्या साहे(ब) लोकास परभारा पाठविण्यास अटकाव नाही व माहराजानी खातरजमा ठेवावी की आम्ही संतोषाने हमेशा माहराजाचे वाजवी कामास समजोन घ्यावयास आलस करीत नाही. व जसे इंग्रजी सरकारचे जाहगिरदारास चालते तसे माहराज सरकारचे जाहगिरदारास चालावे. व त्या जाहगिरदारावर पेशवे याचे वेले पासून माहराजाचा हुकुम नाही आसे दिसत नाही, औरस आथवा दत्तक वारसदार नसल्यास इंग्रजी सरकारची बाहदारी खुटती व त्या जाहगिरी माहराजाकडे येतात व माहराजानी कोणास दत्तक देऊन चालवावे आसे नाही.
या प्रमाणे पत्र आले ते इकडे द्यावयाचे गवरनर ग्रांट साहेब व रसिदंट लाडउईक साहेब याचे मनात नव्हते आसा भाव दिसला. परंतु फार युक्तीने मागून घेतले. आसा मार कोर्ट आफ डरेक्टर्स याणी इकडील तारफेचा वगैरे लिहिला त्याजवरून इकडील साफीचा दोरा विलयते पावतो पोहचला, तेव्हा आता आपले हाती कम जाजतीचे काय राहिले हे मनात आणिले आणि लिहिल्या प्रमाणे बंदोबस्त करून दिल्हा नाही. पुढे रसिदंट लाडउईक साहेब यासी वारंवार रुबरु मार बोलण्यात आले की तुम्ही आसला खटला उपस्थित जाहल्यानंतर गौरनर क्लेर साहेबहि विलायते) स गेले व दुसरे गौरनर आले. तुमचीही बदली जाहली म्हणजे तसेच राहील. त्यास लेख व वहिवाटीप्रमाणे उलगडा होत नाही व विलायेतचे जबाबाची टेपही न समजे. तेव्हा इकडून कलकत्यास विलायतेस मार कलविला पाहिजे आसे सांगितले, त्याजवर रसिदंट साहेब बोलले की माहराजाचा जाबसाल खरा आहे.
परंतु कौसलातून असे हुकुम येतात त्यात मी बोलू सकत नाही आसे बोलत आले. व रसिदंट साहेब नहर मुकामी आसता बाळाजीपंत किये याजबरोबर इकडून निरोप सांगून पाठविले होते की तेथे खटला न उगडल्यास इकडून कलकत्यास व विलायतेस कलविले पाहिजे. त्याचा जाबहि किये याणी चिटी इकडे लिहून पाठविले त्यात आहे की मैलानी मैल काढिला पाहिजे आसे आले. त्यास मैल म्हणजे दोष व दोष नसता चांगले वहिवाटीस दोष लाऊन दोषानी दोष निघतो आसे म्हणणे आसी चाल कोठेही नाही आसे लिहिले, याचे कारण आपण लेखास व वहिवाटीस खलेल आणली ही खबर आपले सरकारात कलू नये. या रागाने व जबरदस्तीने आहे. पुढे माहाबळेश्वर मुकामी गवरनर ग्रांट सो याची मुलाकत जाहली ते वेलेस येविसी समक्ष बोलण्यात आले की येथे मारं समजोन घेऊन लेख व वहिवाटीप्रमाणे उलगडावे आगर आमुक दिवसात विलायतेहून जबाब आणवितो आसे कळावे.
कारण गौरनर क्लेर साहेब ही आसेच बोलून पुढे विलायतेस गेले. तसेच आपणही गेला म्हणजे पुढे दुसरे गवनर येतील तेव्हा ते म्हणतील की त्याचे हातून न जाहले ते आमचे हातून कसे होइल? आसे पुढे होणार मालकम साहेब यांचा व पादशाही कोडतवाल्याचा पेशजी खटला पडला, तेव्हा मालक साहेबानी विलायतेहून जलद बंदोबस्त करऊन अणविला. आसे कामाबद्दल जलद होते आणि इकडीलही वाजवी मार आसोन खलेली च्यार वर्षे जाहली. येथे बंदोबस्त न होई व विलायतेचे जाबाचा अक्षेप तेही न होई. सा इकडून कलकत्यास व विलायतेस कोर्ट आफ डरेक्टर याचे लिहिण्याप्रमाणे कलविणे प्राप्त आहे आसे इकडून बोलण्या (त) आले. त्याचे कारण आसे. त्याचे करण्याचे चालीमुळे इकडे दिलास कोणती खात्री न वाटे, सा है बोलण्यात आले.
ते वेलेस रसीदंट लाडउईक साहेब होतेच. ते बोलले की मी वारंवार येविसी कौसलात लिहिले आहे आसे समक्ष बोलले. तेव्हा त्याचे मनातील कर्तव्य भाव काय हा इकडे न समजे व दिवसे दिवस वहिवाटीस हरकत हरयेक कामास पडत चालली. यामुळे काम करण्यास आडचण पडू लागली. सा कोर्ट डरेक्टर याचे लिहिले प्रो पत्र देऊन पाठविण्याचा विच्यार केला होता. तो पुढे रसीदंट लाडउईक साहेब याणी इकडे येऊन विच्यारले की माहराज विलायतेस कोणी पाठविणार की काय? त्याचे उत्तर केले की दिकती निघोन च्यार वर्ष जाहली. येविसीचा बंदोबस्त होईना. सा बोलणार कोर्ट आफ डरेकटर याचे लिहिल्या प्रा पाठवावे असे योजिले आहे. त्यास रवाना करू ते वेलेस तुम्हाला कळऊन पाठऊ आसे सांगितले. त्याजवर रसीदंट साहेब बोलले की हे माहराजानी नीट केले नाही.
माहराजाचे बाजीरायाप्रमाणे होईल, वगैरे बेआदबीची बोलणी बोलले. तो बयाज फार आहे. पुढे इकडील बोलणारास रसीदंड सो याणी बोलाऊन नेऊन बोलले की आता विलायतेस माहराज बोलणार पाठविणार, तेव्हा माहराजाची व आमची दुस्मानी जाती आसे रसीदंट साहेब बोलले. पुढे इकडूनही यादी पाठविल्या. परंतु जबाब नाही. सबब विलायतेस पाठविण्याबद्दल पत्रे राजश्री गोविंदराव विठल याचे घरी तयार होत होती. तो पुढे दोन महिन्यानी सन १८३६ तारीख ७ आगटंबर रोजी रसिदंट साहेब याणी आपले लस्करची तोफासुद्धा तयारी करून, इकडे आगोधर किये यास पाठवून, आम्ही पुण्या करीत होतो तेथून उठविले. नंतर रसिदंट साहेब येऊन बोलले की संत्री याचा फितुराचा मार आहे तो गोविंदराव यास विच्यारावयाचा आहे. त्यास पाठवून द्यावे, त्याजवरून उत्तर केले की इतका दंगा करावयाचे कारण नव्हते. सांगून पाठविले असते तरी पाठवून दिल्हे असते.
नंतर गोविंदराव यास पाठविले. त्यानी कैद करून ठेविले. ते त्यास क्रीतीचा काही आधार नसता तोंडचे बोलण्यावरून कैद करून ठेविले. येविसी उत्पन्न होण्याची कारणे सदरी लिहिलीच आहेत. आसा करण्याचा क्रम होत आला. याजवरून फितुराचे तुफान कोण्हीकडून उपस्थित जाहले हे पाहवे, आसे करण्याचे कारण मिळोन इकडील वाजवी मजकुरास आपण खलेल आणली, येविसी इकडील माार कोर्ट आफ डरकेटर याजकडे व पादशाह सरकारात व लाट साहेब यास कलला असता, त्याणी मनास आणू नये, व इकडील बोलणारानी माजी पडावे आणि आपले केलेले कायम व्हावे सा हे भाव त्याणी उपस्थित केले आहेत. येविसीची चौकसी होण्यापूर्वी ओलबी साहेब सक्रटर व रसीदंट लाडउइक साहेब चौकशीविसी आले. तेव्हा त्यास सांगितले की चौकसीचे वेलेस इकडील कोणी आसावा. परंतु केले नाही. नंतर चौकसी जाहल्यावर पाहण्याकरिता आम्हास जातीने बोलाविले.
त्याप्रमाणे बंगल्यास स्वारी गेली. तेव्हा इकडून सांगितले की जबान्याच्या नकला इकडे द्याव्या व जाते वेलेस इकडे कसा मार ठरविला तो कलऊन जावे, म्हणोन सांगितले होते, ते न भेटता गेले व जबान्याच्या नकलाही दिल्या नाहीत आणि मन मानेल तसे परभारे काय केले हे न कले तत्रापि बंगल्यास स्वारी गेली ते वेलेस इकडून खात्रीविसीची याद दिल्ही, त्यास हसील, इंग्रजी सरकारानी काही काम सांगून खात्री पाहावी, किंवा इकडील आसबाब आसेल तो स्वाधीन करून घ्यावा, तो इकडून बेखलष स्वाधीन होतो किंवा नाही हे पाहवे. किंवा इंग्रजी सरकारचे इंग्रजी सरकारनी बंदोबस्त करून खात्री पाहावी, इकडून वोढ कोणतीही नाही. इकडे येक हुरमतीचा व मातबरीचा दरकारं आहे.
लोभ कोणताही नाही. आसी याद तारीख २९ आगटंबर सन १८३६ रोजी दिल्ही. व पुढे गवरनर साहेब यास सालाबादप्रमाणे दसऱ्याचा पोशाख इकडून पाठविणे तो हुजल्याबरोबर देऊन त्याबरोबर गवरनर साहेबास काही भार कलवणेविसी सांगितला होता. परंतु पोशाख घेतला नाही व त्याची भेटही न घेता, त्यास तीन महिने ठेऊन घेऊन, गौरनर साहेबाची खुसी नाही आसे सांगून, पोशाखसुद्धा परत पाठविला. पुढे रसीदंट इकडे समक्ष बोलले होते की रसीदंटाखेरीज माहाराजानी परभारा बोलणे करू नये, जे असेल ते लिहून लेहून पाठवीत असावे. आम्ही इंग्रजी सरकारास जेथे पाहिजे तेथे पाठवीत जाऊ, त्यावरून पुढे रसीदंट लाडउईक साहेब इकडे येऊन बोलणे जाहले. तेविसी इकडून याद पंधरा कलमाची तारीख २३ मार्च सन १८३७ रोजी पाठविली. ती याद रसीदंट याणी परत करून सांगितले की या यादीपैकी तीन कलमे व येकुणात इतके लिहून बाकी गाळून वाद लिहून आल्यास घेऊ. नाहीतरी घेणार नाही.
त्याजवरून त्याचे सांगण्याप्रमाणे याद तयार करून पाठविली. त्यात लिहिले की इलफिस्तंन साहेब याचे पत्र रसीदंटावर बोलणे आसेल ते परभारे समजोन घ्यावे आसे आहे. व पेशजी आसे साहेब लोकांचे हाते बोलणे केले, व इकडील कोण्ही पाठऊनही बोलणे केले, आसी वहिवाट मालक (मालकम) साहेब गीरनर आखेर पर्यंत आहे. सा डाकतर मिलन है साहेब साहेब लोकच त्यास या मोकदम्याविसी बोलण्याकरिता इकडे येऊन गार समजोन घेण्याकरिता सांगितले. परंतु हे लेख आसोन होत नाही, तेव्हा मर्जी इंग्रेज सरकारची, आसे लेहून पाठविले व पंधरा कलमाची याद लाडउइक साहेब याणी घेतली नाही. सबब ती याद व त्याजबरोबर गवरनर ग्रांट साहेब यास पत्र आले. डाक्तर मिलन साहेब यास पाठऊन गवरनर साहेबास देण्याविसी सांगून पाठविले, तेही गवरनर साहेबानी घेतले नाही व मारही ऐकून घेतला नाही, सा डाक्तर साहेबाचे हते इकडून मजकूर लिहून कलकत्यास व विलायतेस कोर्टडरेक्टर याजकडे जाहीर व्हावे म्हणोन पाठविला.
पुढे लाडउईक साहेब याची बदली होऊन वोवीन साहेब कामावर आले. तेही प्रथम मुलाकतीचे दिवसी इकडे बोलले की माहाराजानी जो मार असेल तो मला कलवीत जावा. मी लाडउइक साहेबाप्रमाणे करणार नाही. तेव्हा त्यासही इकडून सांगितले की ज्या गोष्टीविसी तुम्हास संशय येईल व कोणी समजायील तो मुदा तुम्ही पका इकडील दस्तऐवजानिसी लाऊन घेऊन नंतर इकडे कलवायें, म्हणजे तो मुदा साबूद आहे आसी इकडील खात्री जाहल्यावर व्याजकडे दोष लागेल त्याचे पारिपत्य इकडून केले जाईल. आसे सांगितले. परंतु त्याणी ते काहीच न करिता व इकडे न कळविता इकडील दुस्मानी लोकाचे तोंडचे बोलणे तुफानी ऐकोन, इकडील मंडली चिटगीविस सुमंत व दिनकरराव मोहिते सेनाकर्त पद्माकर रघुनाथ पराडकर व रवळोजी नाईक कासकर वगैरे आसाम्या नेऊन कैद करून मन मानेल तसे इकडे काही येक न कळविता केले. आसा क्रम होत आला. याजवरून द्वेषी लोक याणी तुफानी रचना कसी केली ही पाहवी.
ये विसीचा शोध लावावा तरी जबरदस्त सरकारचे भयामुळे इकडे कोणी न कलवीत. कारण इकडे वास्तविक मारही कोणी कळविला. तरी त्या लोकाचा इकडून बच्चाव होणार नाही. याजमुळे लोक भितात. तत्रापि इकडून शोध न करिता आपणहून ज्या लोकांनी कळविले, ते पाहिले म्हणजे ध्यानात पुरे येईल व कितेकानी मुद्दे लाऊन देतो म्हणोन बोलले, पुढे भयामुळे आले नाहीत. याचे कारण ज्यानी दिल्हे त्यास कैद केले व जे कलविण्यास पाठविले त्यास ही कैद केले. हे समजोन कोणी इकडे येईनासे जाहले, ये दिसी सारा माार कोटेडरेक्टर याजकडे व लाटसाहेबाकडे पेशजी लिहिला आहे. परंतु पल्ला लांबचा लेखानी समजुतीस कसे येते न कले व डाकतर मिलन साहेब यास माहितगारी करून दिल्ही आहे तेही वरचेवर लिहीतच आहेत. परंतु पेशजीचा शिरस्ता आसता डाकतर साहेबाची व इकडील समक्ष गाठ पडू देत नाहीत, याजमुळे काही कलमात लेखावरूनच समजुतीत येण्यास आंतर पडेल.
याजकरिता डाक्टर साहेब यास इकडे येण्याविशीही आटकाव नसावा, व पेशजी ब्रिक साहेब याजविसीचा निंबालकराचे प्रकर्णी मार कसा जाहला, तो इलफिरतन साहेबास माहित आहे. पैलेस इन साहेब होते ही बाजीप्रमाणे पाहून मनात आणून केले. नाहीतर हलीचे साहेब लोकाप्रमाणे आसते तरी त्याच डीलास येण्याचा बेत होता. जे वेलेस इलफिरतन साहेब कामावर होते तेव्हा दोस्तीची चाची बोल होती. ती गौरनर मालक साहेब व रसीदंड शमी(न)सन साहेब गेल्यापासून नजरेस येईनासे जाहले, परंतु इकडून चाल व वहिवाट बैखलश दोस्तीची इलफिरतन साहेब होते ते वेलेप्रमाणेच आजपर्यंत ठेविली आहे. तत्रापि आसा प्रसंग गुदरला आहे की या सरकारचे खानदान व चालीचे वागणुकेचा मार्ग कसा हे इंग्रजी सरकारचे कामगाराचे दिलात येत नाही. य माहीतगार कामगार इकडे कोणी राहिले नाहीत.
सबब या बोलखीची गरज न ठेविता ज्यावेलेस जसे मनात येते व दुष्मानी लोक समजावितात तेच खरे मानोन त्या आग्रहास पडोन तसेच होत चालले आहे. त्याची दिवसे दिवस वृद्धी आहे. तेणेकरून इकडील लेकिकास किती नुकसानी जाती है। दिसतच आहे. या देशातील सर्व लोक इकडील दुस्मानी करितात, याचे कारण आम्ही आलों इंग्रजी सरकारची दोस्ती केली. यामुळे सर्वाचा फायदा बुडविला, आसे सर्वाचे मनात आहे. त्यास इकडून येक इंग्रजी सरकारची मात्र दोस्ती या भरवसियांवर आहो. त्यास इकडील येक इरादा मनात आहे की गैरवाजवीविसी इंग्रजी सरकारास भीड घालावयाची नाही. इंग्रजी सरकारची दोस्ती पेशजी पासून वडिलार्जित आहे. तेव्हापासून आजपर्यंत या सरकारात जे दोस्तीत मिलाफ नाही याचा कयास इंग्रजी सरकारनी पुरा दिलात आणून समजून करणे असेल तसे करावे. रुजुवात व लबाडीच्या रचना लबाड लोकांचा येका होऊन क्रीतीचे नये दस्तऐवज करणे वगैरे अनेक प्रकारे द्वेसी लोक आपले शाहणपणाची खोटी क्रीति हरतऱ्हेने खरी होण्याच्या तजविजी करू सकतात.
परंतु जे लोक मोठे चालीचे व अकलवंत आहेत ते पाहतात की आपला नाम जाला नाही व त्याणी आपले चालीत फरकही आणिला नाही व निर्लोभी आहेत. या ती (न) कलमावर इनसाफ पाहाणाराची कायमता आसली म्हणजे दुस्मानी लोकाचे काही चालत नाही आणि ही तीन कलमे न पाहिली म्हणजे दुस्मानी लोक आनेक तन्हा करू सकतील. त्यास जे मोठे सरकार व इनसाफी आकलवंत आहे ते हेच पाहातात की या तिही कलमात व्यत्यये नाही. तरी ते सरकार आपले लौकिकाकरिता सर्वास भरवसा लौकिक राहण्यास्तव दुस्मान लोकाची भीड न धरिता पारपत्य करतात व मोठे लोकाची खातरदारी खरेपणावर नजर देऊन ठेवितात. आसे पेशजीपासून मोठे मोठे राजे व पादशाह लोक करीत आले. त्याचीच नामदारी लीक मानीत आहेत. हली हा आधिकार ईश्वरानी इंग्रजी सरकारास दिल्हा आहे. सा इनसाफ मनात आणण्याकरिता लिहिले आहे. खानदानी लोक पूर्वीचे आपले चालीस न सोडणारे आसे जे आहेत, ते नामोसीचे कलम कसे करू शकतील? सा चाल पाहून करावे लागते. व मोठे लोक आहेत त्याणी मातबर लोकाची खात्री वाजवी गोष्टी विसी नजरेत आणिली म्हणजे ते लोक आधिक खात्री व साफीने चाल ठेऊन चालतात.
यात मोठे सरकारचा लौकिक आहे. आसे न जाहले म्हणजे त्यास आपले जीवित्व आधीक आहे आसे वाटत नाही. खानदानीवर नजर न देता सुखाकरिता व पोटाकरिता राजी होणे हे हलके मनुष्याची चाल आहे. खानदानी लोक गैर राहास राजी नसतात. ज्या ईश्वरानी ऊत्पन्न केले त्यास पोटाची कालजी आहे. त्याजवर भरवसा आसतो. यात आधीक आहे आसे नाही. त्यास इंग्रजी सरकारनी समजोन करणे आसेल तसे करावे. य पूर्वीचे खानदानाचे लौकिकावर नजर ठेऊन पेशजी पासून आजपर्यंत इकडून चाल ठेविली आहे त्यास इकडून दोस्ती सेवटपर्यंत ठेविलीच जाईल.
वरकडाप्रमाणे इकडून होणार नाही ही पुरी खात्री ठेवावी आणि इकडे हरयेकविसी आडचणी वारंवार न पडे आसा बंदोबस्त होऊन जबाब लौकर यावा. परंतु इकडील सर्व मार इंग्रजी सरकारात वाकब कसा होतो हे पाहत आहो. त्यास हलीचे खटल्याचा बंदोबस्त होऊन पुढे हमेशा इकडील खबर पकी कळावी आसा कागदोपत्री व येणार जाणार हे व्हावे. हे न होईल तरी जो द्वेष वाढला त्याजविसी कोणते पैलेस कसे होईल याचा नेम कलत नाही. व आपले काम जरुरीने जलद करण्यात येते तसे हे पाहून बंदोबस्त होऊन जलद जबाब कळावा. नाही तरी काय कर्तव्य असेल ते तरी समजावे, बहुत दिवस जाहले सबब हली पुन्हा लिहिले आहे. जलद जबाब समजावा व पेशजी कंपनी सरकारचे कामगार याणी पादशाहा सरकारात बोलून मालक साहेब गवरनरीचे कामावर आसता ते वेलेस ठरविले की रीकार्ड पादशाही कोडतातील मुंबई येथील याणी हिंद लोकाचे वहिवाटीत पाहू नये, याचे कारण आमचे करारनामे हिंदचे लोकासी जाहले आहेत आणि रिकार्ड पाहू लागले आसता त्या करारास व्यत्यये येईल, त्याजवरून पाहणे ठरेल आसे ऐकण्यात आहे.
त्यास कंपनी सरकारचे कामगारानी करार केले व दस्तऐवज दिल्हे. त्यास व्यत्यय कंपनी सरकारचे कामगारानी आणिले. आसं होऊ लागलियास मग आर्थातच रिकार्ड याणी ते समजोन घ्यावे आसे होते. कारण जी सा पादशहा सरकारातील रिकार्ड याणी न पाहण्याची लाऊन ठरऊन घेतले, त्यास सबबेसच त्याणी व्यत्यये आणिला म्हणजे अर्थातच पाहणे जरूर आसे सिध्ध होते. व पेशजीचे पादशहा व त्याचे मंडलीचे नावे या सरकारास शाळेबदल पत्र आले त्यात आम्ही महाराजाची गणणा आपले आपले मंडळीत केली आसे लिहिले आहे व त्याचे उत्तरही इकडून ते वेलेस लिहिले आहे. तेव्हा करारास व्यत्यये आल्याचे पादशाहा सरकारातून पाहातील. हा भरवसा जाणून इकडील विसी उलमार साहेब व त्याचे बरोबर इकडील येशवंतराव राजे सीकें व भगवंतराव विठ्ठल पाठविले आहेत. व त्याजबरोबर पेशजीचे वगैरे वहिवाटीचे कागद पत्र पाठविले आहेत.
त्यास कुंपीणीचे ठरावाचे व वहिवाटीस व्यत्यये आणिले, त्याचे तपशील कलवितील, त्या प्रमाणे तूर्त बंदोबस्त जलद होऊन इकडील मंडळी इकडे पूर्ववत प्रमाणे यावी. नंतर पेशजी इंग्रजी सरकार व या सरकारचे कागद व दुसरे सरकारचे करार व वडिलोपार्जित शाहुमहरा(ज) आखेर वहिवाट व त्यापुढील वहिवाट इंग्रजीचे पूर्वीची ती समजोन घेण्याचे मार इकडे समजल्यानंतर पुन्हा इकडून जबाब लिहिण्यात येईल. इकडे इंग्रजी सरकारचे कामगारानी बहुत तसदी दिल्ही. यामुळे त्या त्या वेलेस कित्येक लो (का) चे हते इंग्रजी सरकारात इकडील खबर पोहचावी म्हणोन पत्रे व सांगण्याचे मजकूर त्या लोकास सांगून कलावे म्हणोन सांगितले आहे. त्यास ते ते कलवितील. यावरून बहुता हते कलले म्हणौन आंदेशा येईल. या करिता हे लिहिले आहे, परंतु सान्यास सांगण्याचा मजकूर येकच आहे. सबब दिकतीचे कारण नाही. जबाब होणे तो होऊन ज्याचे त्याचे हतून इकडे जबाब कळावा म्हणजे ज्याज्यास सांगितले त्याचे हतून आमूक जाहले आहे आसे समजण्यात इकडे येईल. सबब आस व्हावे. जियादे चबुजत व पादमानी जायलम मुस्तदाम यकामबद
(सोमवार १२ नवंबर १८३८. कार्तिक व ११ शके १७६०)
अर्ज नं. २
बादशाहा इंगलिस्तान
सरकार यांस
प्रतापसिंह माहाराज
छत्रपति सरकार संस्थान
सातारा याचे
अष्टपैलू जिनत अफ जाय औरंग सलतनत कामरानी बुलंदवक्ष दैहिने खलाफत शिक्का व ज्याहानबानी तिरानी दैयबजने दौलत व फर्मानरवाई व फराजीदै अलमे ज्याहानगिरी व गीषवर गुषाई नैयरेसीफ हार जिल्ला इलाही गौहारमें अदने पादशाही व अफताब अलम ताबे दौलत का हर व महताबे ज्याहान ताबे हाथगत बाहार बर असमान निकुइताबान व दरक्षानबाद
र्छ आषहावेती जंगामेरास्त खरामे खामेमे व दुतरामामे व माहाराजः फलकदरजः दरअरसैतवक अतिराजी चिनीन जवकंदादः मिअदयके दिगर इकडील द्वेषी तुफान तर्कटी लोकाचे समजाविण्यावरून इकडील दस्ताऐवज काही येक नसता व चाल मनात न आणिता व मंडळीचेही दस्तऐवज नसता सर्व खोटा वितंबा बनावणीने इंग्रजी सरकारचे कामगारात बालाजी नारायण नातु वगैरे याणी द्वेषानी समजाऊन उभा केला. याचे कारण नातु याचे मनात इलफिस्तन साहेब याचे वेलेपासून इकडील कारभार करावा असे होते. परंतु ते जाहाले नाही व त्याचे मनात द्वेष होते. परंतु रसीदंट रा (न) सन साहेब व गौरनर मालक साहेब बाहादूर अखेर त्याणी होऊ दिल्हे नाही. अलिकडे रसीदंट लाडउइक साहेब याचे वेलेपासून सरहादीचा तंटा पुणे मुक्कामचे येजेंट कचेरीतील वार्डिन साहेब यांस कलऊन विपरीत आर्थ करून उभा केला.
येविसी इलफिस्तन साहेब वगैरे यास सरहादी प्रकर्णी पत्रे लिहिली होती. तेविसी जबाब कोर्ट अफ डरेकटर याजकडून मुंबई कौसलात लिहिला अला. त्यात बंदोबस्ताविसी व माहाराजाकडील मजकूर ऐकून घेण्याविसी खुषी आहे, असे मजकुराची याद कौसलातून रसीदंट याजकडून इकडे अली. त्यातील मजकुरावरून इकडील पैगाम विलायत पर्यंत जाहला असे वाटून, त्याणी लेख सोडून जे केले ते बाहेर पडून टपका येईल, हा वाकुडपणा मनात आणिला अणी त्या लिहिण्याप्रमाणे बंदोबस्त केला नाही. सबब इकडून विलायतेस कोणी पाठऊन मजकूर समजवावा असी योजना होत होती, हे चितात वाईट वाटून, हे तुफानी फितुराविसी विलंबे उभे केले.
त्यात नातु वगैरे याणी कितेक द्वेषाची कारणे मनात आणून त्याणी तुफानी लोक गैर चालीचे व लाच खाणार इंग्रजी सरकारानी घालविलेले व अक्षरासारखे अक्षर काढणार व रुजवातीस होय म्ह(ण)णार व चोर चाहाड असे चालीचे लोक जमा करून त्या लोकाकडून बोलविणे व लिहून देविणे असे तर्कट उभे करून इंगजी सरकारचे कामगारास समजाविले. त्याणी पुरी दर्यापती करावी ते न करिता व इकडील चालीचाही अनुभव असोन हे मनात न आणिता, इकडून विलायतेस पाठवण्याची योजना केली होती, या रागामुळे अशा तर्कटी लोकाचे खरे मानून इकडे मार न समजाविता इकडील मोठी मोठी अब्रुदार मनुष्ये नेऊन कैद करून इकडून यादी व पत्रे पाठविली त्याचा जबाब न लिहिला व कामगारानी येक तर्फीच मार परमारा विलायत कलला.
त्यास तरजमे लिहून रवाना केले असे ऐकिले, त्यास तोच येकतर्फी मार समजुतीस येऊन हुकूम होईल तो न व्हावा. व इकडील मंडळी मोठी मोठी हुरमतदान खरे चालीचे बीन अपराधी नेऊन कैद केले. त्यास बहुत दिवस जाले. असे असता कोणता गुन्हा तो त्या मनुष्याचे दस्ताऐवजानिसी शाबुदही केला नाही, त्याअर्थी त्यास सोडून देऊन पूर्ववतप्रमाणे इकडे जाण्याचा हुकूम व्हावा. तो न होता खरे चालीचे लोकाचे खरे न मानिता, गैर चालीचे लोकाचे सांगण्यावर गुन्ह्याखेरीज हुरमतीस कमी करणे कायदा नसता अबरू घेतली व त्याचे हालही बहुत केले. येविसी इकडील मार येथे कोणी समजून न घेईत व उत्तरही न लिहीत, सबब इकडील अहावल तेथे जाहीर व्हावयाकरिता डाकतर मिलन साहेब हे इकडील दोस्त जाणोन त्याजकडून मार वरचेवर कलवणे व पत्रे कलकत्यास व विलायतेस लिहून पाठविली.
परंतु बंदोबस्त होऊन जबाब आला नाही. इकडील लौकिक व मातबरी व चाल न पाहाता हुरमतीस कमी आणिले, त्याची व्यवस्था आज पर्यंत जाहाली नाही. त्यास इंग्रजी सरकार अदल इनसाफी असा इकडून भरवसा पेशजीपासून इंग्रजी सरकारचे दोस्तीवर ठेऊन अहो त्या कृत्यास बहुत दिवस जाहाले अद्यापि बंदोबस्त न जाहाला याजमुळे हाली लिहिले आहे. तरी पेशजी कलकत्यास व विलायतेस इकडून मिलन साहेब याचे विद्यमाने लिहिणी गेली ती समजून घेऊन लिहिले प्रमाणे बंदोबस्त होऊन जबाब यावा आणि इकडील मजकूर वरचेवर तिकडे कलण्यास येई. असी कागदोपत्री व जाणार येणार सुध्धा अमदरफ्ती राही.
असी तजवीज, लांबचा पला सबब अगोधर होऊन इकडे कलले, म्हणजे हमेशा खुलापाने इकडील कचा मजकूर लिहिण्यास व समजविण्यास ठीक व खात्री होईल, नाही तरी मनुष्याचा प्राण वाचणे कठीण, असी तुफाने उत्पन्न होण्याची कारणे, इकडील वहिवाट दस्तऐवजानिसी नीट असता इंग्रजी सरकारचे कामगार म्हणतील तसे त्याचे मनाजोगे न ऐकिले, म्हणजे मुळापर्यंत दाद लागणार नाही. हे समजोन कामगार असी कारणे पाहिजे तसी उपस्थित करून इंग्रजी सरकारचे मनात येकतर्फी आणून देतात व देतील. यास्तव सदरहू लिहिले प्रमाणे इकडील मंडळी नेली. त्यास अगोधर इकडे पूर्ववत प्रमाणे इकडे जाण्याविसी हुकूम होऊन कागदोपत्री जाणार येणार सुध्या व कोणी साहेब लोक इकडे येऊन मजकूर समजोन घेऊन इंग्रजी सरकारात कलविण्यास जातील येतील त्यांस अटकाव न होता, रस्ता खुला राहून तेथे दाद लागती व ऐकून घेणे होते, असे जाले म्हणजे असी कारणे उभी न राहता बंदोबस्त राहील. व इकडील लोकास इजा होणार नाही. याजकरितां जबाब जलद यावा. व पेशजी कंपनी सरकारचे कामगार याणी पादशहा सरकारात बोलून मालकम साहेब गवरनरीचे कामावर असतो ते वेलेस ठरविले की रिकार्ड पादशाही कोडतातील मुंबई येथील यांणी हिंद लोकाचे वहिवाटीस पाहू नये.
याचे कारण अमचे करारनामे हिंदचे लोकासी जाहाले आहेत आणि रिकार्ड पाहू लागले असतां त्या करारास व्यत्यये येतील त्याजवरून न पाहाणे ठरले असे ऐकण्यात आहे. त्यांस कंपनी सरकारचे कामगारानी करार केले व दस्ताऐवज दिल्हे त्यांस व्यत्यय कंपनी सरकारचे कामगारानी आणिले. असे होऊ लागल्यास मग आर्थातच रिकार्ड याणी ते समजून घ्यावे असे होते. कारण जी सबब पादशाहा सरकारातील रिकार्ड याणी न पाहाण्याची लाऊन ठरवून घेतले. त्या सबबेसच त्याणी व्यत्यये आणिला म्हणजे अर्थात पाहाणे जरूर असे सिद्ध होते. व पेशजीचे पादशाहा व त्याचे मंडळीचे नावे या सरकारास शाळेबदल पत्र अले त्यात आम्ही माहाराजाची गणणा आपले मंडळीत केली असे लिहिले आहे व त्याचे उत्तरही इकडून ते वेलेस लिहिले आहे. तेव्हा करारास व्यत्यये अल्याचे पादशाहा सरकारातून पाहातील.
हा भरवसा जाणून इकडील यशवंतराव राजे सिर्के व भगवंतराव विठ्ठल पाठविले आहेत व त्याजबराबर पेशजीचे वगैरे वहिवाटीचे कागदपत्र पाठविले आहेत. त्यास कुपणीचे ठरावाचे व वहिवाटीत व्यत्यये आणिले त्याचे तपसील कलवितील. त्याप्रमाणे तूर्त बंदोबस्त जलद होऊन इकडे (यादा) नंतर पेशजी इंग्रजी सरकार व या सरकारचे कागद व दुसरे सरकारचे करार वडिलोपार्जित शाहु महाराज अखेर वहिवाट व त्या पुढील वहिवाट इंग्रजीचे पूर्वीची ती समजून घेण्याचे भाव इकडे समजल्यानंतर पुन्हा इकडून जबाब लिहिण्यात येतील. य हाली कचे मजकुराचे पत्र प्यारलमेटास पाठविले आहे. तेही पाहण्यात यावे म्हणजे सर्व दिलात इकडीलविसी येईल. इकडे इंग्रजी सरकारचे कामगारानी बहुत तसदी दिल्ही. यामुळे त्या त्या बैलेंस कितेक लोकाचे हाते इंग्रजी सरकारात इकडील खबर पोहचवावी म्हणोन पत्रे व सांगण्याचे मजकूर त्या लोकास सांगून कलावे म्हणोन सांगितले आहे.
त्यास तेते कळवितील यावरून बहुता हाते कलले म्हणोन अंदेश येईल, याकरिता लिहिले आहे. परंतु साऱ्यास सांगण्याचा मजकूर येकच आहे सबस दिकतीचे कारण नाही. जबाब होणे तो होऊन ज्याचे त्याचे हातून इकडे जबाब कलवा, म्हणजे ज्याज्यास सांगितले त्याचे हातून आमुक जाहले आहे असे समजण्यात इकडे येईल सबब असे व्हावे. जाफ्ततावे सलतनत व कामगारानी व नयैजान जानमत जाद्दा जबाजीसात जावलात जाबद.
मर्यादेयं
विराजते
(९) साताराचे छत्रपति प्रतापसिंह महाराज यांच्या उच्चाटनाच्या कारस्थानांत भाग घेणाऱ्या स्वराज्यद्रोही इसमांच्या जबान्या.
[अस्सल मोडी दस्तऐवज बरहुकूम नक्कल]
श्री.
यादी श्री मन्माहराज राजश्री छत्रपति सरकार हुजूर सातारा मु ।। तिसा सलासीन मयातैन व अलफ ता। ४ व ता। ९ दसंबर सन १८३८ ची हुकुमी पत्रे रंगो बापूजीस मुंबई मुकामी आली त्यात हसील मजकूर की हलके तरकटी दुषमानदार याणी द्वेषानी खोटे चुरसीने नवीन तुफाने उत्पन्न करून कंपनी इंग्रजी सरकारचे कामगारास गैरबाका समजाऊन काही कारण नस्ता उभये सरकारात तेंड आणोन मोठी मोठी मंडली याचा दस्ताऐवज न धरिता व पत्ता मुदा त्याचे पदरी घालून काईल न करिता व उभय सरकारचे समक्षे ठरून सारे खोटे पाहून ज्याकडे गुन्हा लागू होईल त्या असामीचे पारिपत्त्ये करण्यास दिरंग लावला असता तरी महाराज सरकार फितुरी लोकाची तर्फदारी करितात असे पुरे जाहिरीत आणून त्या असामी इंग्रजी सरकारातून कैद करावयाच्या होत्या ते काहीच न केले आणि जबरीने पाहिजे तसे कायदा सोडून दुषमानदार याचे समजावण्यावरून कैद केले व बालाजी कासी किबे बालाजी नारायण नातूनी नाना प्रकारच्या वल्गना करु लागले की महाराजानी अशात उमजावे आणि फितूर केला खरा म्हणीन लिहून इंग्रजी सरकारात द्यावे हे चांगले. नाही पेक्षा ही गोष्ट फार वाईट. यात दौलतीस अपाय होईल, अशा अनेक तऱ्हेच्या वार्ता जेनात उठविल्या. ते मजकूर महाराज सरकारात कळून त्याविशीचा विचार होऊन चोकसी बारकाईनी करिता सरकारी जामदार खान्यातील दागीने व जव्हाहीर वगैरे चोरी केली. किबे व नातु याणी फितुरी खोटी पत्ते लिहिण्यास सांगून जमादार व कारकून यास मिलाफात घेऊन त्या खोटे पत्रावर सिके केले हा मजकूर हजूर सरकारात पुरा कलताच त्या असाम्या कैद करून चौकशी चालू केली, येविसी खबर इंग्रजी सरकारात जाहीर होण्याबद्दल ता. ४ नवंबर सन १८३८ नवंबर ११७ येकसे सत्राची यादी रसीदंट याजकडे पाठविली आणि भाऊ लेले व अपा सौंदकर व हैबतराव व विस्वनाथराव व बापूजी अनंदराव व जानू भंडारी जामदार व रंगो महिपत व सीताराम गोपाल वगैरे याणी जबान्या व पुरसीसा लिहून दिल्या, त्या पाहाता सदरहू आसामीने खोटे फितुरी कागद बनाऊन सरकारी जामदार खान्यातील सीके चोरून काढून सीके केले व चोरी केली. सरकारनुकसानी करून खोटी पत्रे सीक्यासुधा सदरहू असामी पासी निघाली आणि त्याणी किबे व नातूचे सांगण्यावरून खोटे कागद फितूरी सीक्यासह केले असे कबूल होऊन सरकारात लेहून दिल्हे व चौकसी चालली आहे. त्यात जे कागद निघतील ते रा होतील व जाले चौकशीच्या कागदाच्या नकला रा केल्या असे. तरी जालेले मजकुराचा अहवाल इंग्रजी सरकारात कलण्याकरिता सदरहू नकलातील जुजबी हसील समजुती करिता काढून त्याचे इंग्रजी तरजुमे करून मेस्तर ज्यान मीलन साहेब बहादूर यांचे हाते मुंबई कलकत्ता विलायेत इंग्रजी सरकारात सदरहू मार ज्याहीर करावा. येविसी खाली तपसीलवार मजकूर लिहिला आहे तो पाहाता ध्यानात येईल.
कलमे
१. मेस्तर रदाक साहेब याणी भाऊ लेले यास खर्चास यैवज देऊन खोटे कागद फितुरी करण्यास सांगितले तैसे लेले कबूल जाले. नंतर त्यास रदाक साहेबानी खातरी बाबत सहीचा कागद करून दिल्हा. त्याजवर माहाराज सरकारात भाऊ लेले येऊन सहीचा कागद व रुपये देऊन ता १४ व ता १८ जून सन १८३७ रोजी जबानी लिहून दिल्ही. तो मार मेस्तर ज्यान मीलन साहेब बाहादूर याणी बंगाल सरकारचे हुकुमावरून मुंबई कौसलातून ता। १८ सप्तंबर सन १८३७ चे पत्राबराबर रवाना केला आहे. पुढे भाऊ लेले यास करनेल वोवीन साहेब याणी कैद करून काय मार लेहून घेतला न कले आणि सोडून दिल्हा तोच हाली या असामीचा दोस्त फितुराचे खोटे कागद सीक्या सुधा केलेले असामीत आहे हे जाहीर व्हावे.
२. अमृत गणेश खडमकर याणी लिहून दिल्हे त्यातील हसील १ ता १५ अगटोबर १८३८ अस्वीन ब|| १२ रोजी लिहून दिल्हे त्यातील हसील मजकूर की आज भाऊ लेले मज(ज)वल म्हणत होता की मजपासी सरकारचे नावची सीक्या सुध्या फितुर प्रकर्णी पत्रे तमाम सावकार लोक याजला आज्ञा पत्रे गेली त्यापैकी येक दोन पत्रे माजे जवल आहेत. परंतु मजला माहराज सरकारानी याज बाबद बक्षीस रुपये पंचवीस हजार दिल्हें तरी मी देईन नाही पेक्षा मी पत्रे इंग्रजी सरकारास दाखवून बक्षीस तिकडून घेईन याजकरिता तुम्ही ही बातमी सरकारास जाहीर करावी. नंतर मी बाबा वैद्य याजपाशी जाहीर केले. त्याने मला सरकारात जाहीर कर्णे म्हणोन सांगितले, तेव्हा मी सरकारात जाहीर केले.
सही आमृत गणेश खडमकर खुद
२. ता. १५ अगटंबर सन १८३८ अस्वीन व।। १२ अमृत गणेश व नारायेण सीवाजी अमीन या उभयंतास भाऊ लेले याणी चिटी लिहिली त्यातील हसील माहाराजाचे सीक्याचा कागद सावकार लोक याचे नावे इंग्रजास सीक्षी करण्याबाबद कामगार हुजरचे रा केले त्यास ऐवज द्यावा म्हणोन पत्र आहे. ते आम्ही तुम्हास अठरा हजार रुपये द्यावे आणि सदरी लिहिले प्रो कागद घ्यावे. त्यापैकी तुम्ही दोन हजार रुपये घ्यावे. सोला हजार रुपये आम्हास द्यावे.
सही भाऊ लेले खुद
३. ता. ११ नवबर सन १८३८ रोजी भिकी सोनारीण कसबीण वा सातारा व नारो बलाल बडुजकर याणी लिहून दिल्हे त्यातील हसील नागर की आपा सिदकर याणी भाद्रपद मासी मजपासी कागदाचा लखोटा दिल्हा आणि सांगितला की हा लाखोटा गणपतराव किबे याजवल द्यावा. त्याप्रो आम्ही लाखोटा गणपतराय किबे यास दिल्हा परंतु आत कागद कशाचे काय आहेत हे आम्हास नाहीत नाही. लाखोट्यावर साहेबांचे नाव लिहिले होते आणि लाखेने चिकटविला होता. पुडे कार्तिक मासी आपा सिंदकर आम्हाजवळ कागद मागू लागले तेव्हा आम्ही सांगितले की तुम्ही सांगितल्या प्रा किबे याचे हवाली लाखोटा केला. नंतर सिंदकर व आम्ही गणपतराव किबे याजकडे गेली. तेव्हा किबे व सिंदकर येकांती काय बोलले ते आम्हास माहित नाही. नंतर सिंदकर याणी किब्यास चिटी सवासे रुपयेची लिहून दिली, तेव्हा ते कागद मजपासी किबे याणी दिल्हे कागद आम्ही सिंदकर याचे हवाली केले. परंतु त्या कागदातून कागद किबे याणी काढून ठेविले होते. त्याजवर भाऊ लेले याणी आम्हास सांगितले की गणपतराव किबे याजवल काही कागद राहिले आहेत ते कामाचे आहेत तरी तुमचा व त्यांचा ने रा तुम्ही मागून घ्यावे, त्याजवरून आम्ही किबे यांजपासी मागून घेतले. ते कागद भाऊ लेले याजवल दिल्हे व भाऊ लेले याणी सरकारात जो मार लिहून दिल्हा आहे तो खरा आहे. गणपतराव किबे व अपा सिंदकर हे तिघेही आमचे स्नेहीच आहेत दुसरा मार आम्हास माहीत नाही.
सही नारो बलाल वडुजकर
भिकी समझे हस्ता अक्षरे खुद
४. भास्कर विश्वनाथ उर्फ भाऊ लेले याचे जबानी व अर्जी व पत्रातील हसील.
१. ता २ नवबर सन १८३८ लिहून दिल्हे की खोटे पत्र समस्त सावकार याचे नावचे सरकारी सीक्याचे येक व विश्वनाथराव यांचे हतचे पत्र येक त्या पत्राचे सीका व मोर्तबाचे तुकडे कातरलेले मजपासी आहेत. ते पुण्यात आहेत. ते मी साहा रोजात आणून देतो व सीका कानून घेतले आणि ते कागद व पत्रे आपा सिंदकर याजवल आहेत.
सही भाऊ लेले
२. ता ३ नवबर सन १८३८ चे लेले याणी लिहून दिल्हे त्यात हसील मार की मी अर्जी गवरनर साहेबास द्यावयासी लि।। तिचा मसुदा आपा सिंदकर याने करून दिल्हा आणि अर्जी मी आपले चिरंजीवाचे हाते लिहून सही मी आपले हाते खुद केली ती अर्जी ता ३ नवबर रोजी मी फाडून टाकिली. गवरनर साहेबाकडे पाठविली नाही. त्या अर्जीत मार लिहिला होता की पेशजी इंग्रजी सरकारात कबुलायेत लिहून दिल्ही आहे की फितुर प्रकर्णी काही कागद दस्ताऐवजी पैदा करून देतो. त्यास हाली अर्जीबराबर दस्ताऐवजी कागदांचा लाखोटा करून पाठविले आहेत. हे घेऊन आमचा बंदोबस्त पेशजीचे करारा प्रो। करून द्यावा म्हणोन.
सही भाऊ लेले खुद
३. ता ३ नवबर सन १८३८ रोजी लिहून दिल्हे त्यात मार हसील. आपा सिंदकर यास साहेबानी पुणीयाहून साताऱ्यास पाठवून दिल्हे ते वेलेस सीक्याची पत्रे खोटी सिंदकर याचे नावाचे होते ते सिंदकर याने साहेबाकडे गुदरण्याकरिता मजपाशी दिल्हे होते. ते मी हाली सरकारात अणून गुदरले आहेत.
सही भाऊ लेले खुद
४. ता ३ नवबर १८३८ रोजी लिहून दिल्हे त्यातील हसील. आपा सिंदकर यास पुणि(या) हून साताऱ्यास साहेबानी सा। केले ते वेले सीक्याचे पत्र सावकार याचे नावाचे होते. ते सिंदकर याणी बाळाजीपत किबे याजपाशी साहेबाकडे देण्याकरीता दिल्हे होते. तेव्हा मजला बातमी नारायेण ब्राम्हण नि भिकी सोनारीण याजकडून कलली. तेव्हा भिकीचे हतून किबे याजकडून कागद अणऊन मी आपले जवल ठेविला होता तो हाली सरकारात गुदरला आहे.
सही भाऊ लेले खुद
५. ता ३१ अगष्ट सन १८३८ रोजी चिटी भास्कर विश्वनाथ उर्फ भाऊ लेले यास आत्माराम लक्ष्मण उर्फ आपा सिंदकर याणी लिहून पाठविले त्यात हसील की प्रयत्न करून सरकारप्रकर्णी कागद पैदा केला तो तुम्हाजवल दिल्हा आहे आणि तुमचे नावाची अर्जी व नावाचा कागद तुम्ही लिहून दिल्हा आहे. त्यानो तुम्ही बंदोबस्त करून घ्यावा. पुराव्यास काही कागद लागल्यास आम्ही साधन जाल्यास देऊ. येविसी खर्च तुमचा व आमचा जाहला आहे. त्याची वेवस्था तुम्ही आम्हास लिहून दिल्ही आहे त्याप्रो करावी. हे कारण समजण्याकरिता आम्हास बोलावणे होऊन नेले आहे. त्यास आम्हास येखाद्यानी गुतविल्यास त्याचा पुस्त पन्ना तुम्ही सरकारातून राखावा म्हणोन
सही आपा सिदकर खुद
६. ता ३० अगष्ट सन १८३८ गवनर साहेबास अर्जी भाऊ लेले याणी केली त्यातील हसील. आपा सिदकर याणी लिहून दिल्हे तो मार की भी रदाक साहेब बाहादूर याचे बंगल्यास जाऊन माहराज सरकारचे दस्ताऐवज फितुर प्रकर्णी धरून देतो म्हणीन कबुलात देऊन दस्त ऐवज सिद्ध करण्याचे प्रयत्नास लागलो तो रदाक साहेब याणी मला धरणे पाठविले. सबब मजकूर समजावण्यास मी मुंबईस अलो तो तेथे माझा प्रवेश जाला नाही. सबब पुणीयास अलो. तेथे मील साहेब कालेकटर याणे धरून लिहून घेऊन साताऱ्यास रसीदंड साहेबाकडे रा। केले. तेथे जैसे मतलबास आले ते जिवाचे भीतीमुले लेहून देऊन जामीन देऊन सुटका करून घेतली आणि माहाराज सरकारची सीक्यानसी दस्ताऐवज हस्तगत करून घेतला आहे. त्यास पेशजी माहाराज सरकारात जबानी लेहून दिल्या त्यास कलकटर जिल्हा पुणे व रसिदंट सातारा याजकडे मार लेहून दिल्हा आहे. तो गैर वाका आहे. तो मजकूर मजूर न धरता हाली मजपासी दस्ताऐवज फितुरी प्रकरणी आहे तो घेऊन माझा बंदोबस्त योग्येते प्रमाण करून घ्यावा. माझे जवळ दस्ताऐवजी पत्रे आहेत ही बातमी माहाराज सरकारास कलल्या पासोन माझ्यावर दावा आहे. घरदार सुधा चुरसीने घेतले. सबब मी पुणियास येऊन राहिलो व मी सरकार कामात पडल्यामुळे विष खाऊन मरावे असा प्रसंग आहे वगैरे मजकूर
सही भाऊ लेले खुद
५ अत्माराम लक्ष्मण सिदकर उर्फ अपा सिदकर याच्या जबान्या वगैरे कागद त्यातील हसील मार
१. ता। २२ माहे नवबर सन १८३८ रोजीचे पुरसीतील हसील की सन सबा सलासीन अशाडमास सन १८३६ या साली गणपतराव किबे याचा व माझा स्नेह. त्याणी मजला बालाजीपंत किबे याचे घरी नेऊन भेटविले, तेव्हा किबे याणी सांगितले की माहाराज सरकारचे व कंपनी सरकारचे वाकडे आहे, त्याजवर आम्हास काही प्रकर्ण कर्णे आहे. तरी तुमचे कारखान्यातील सीका आणून द्यावा. आमचे काम जाले म्हणजे परत देऊ व तुमचा चांगला बंदोबस्त कंपणी सरकारातोन करऊन देऊ. तेव्हा मी उत्तर केल की सीका हस्तगत जाल्यास उपयोग काय आहे? माहाराज सरकारचे कामात वागणारे याची हातची पत्रे व त्याची चिन्हे व माहाराज सरकारचे हतचे निशाण पाहिजे, मग सीक्याचा उपयोग आहे. तेव्हा किबे बोलले की माहाराज सरकारचे कामाची पत्रे व यादी येतात. त्याजवर माहराजाचे कामगाराची चिन्हे आहेत, ती काढून जोड भरून सीके करू. तुमचा आमचा एक विच्यार आहे. तेव्हा तुम्हास सांगतो याबाबद गणपतराव किबे याणी पत्रे सवज्ञेची लिहिली ती अली आहेत. परंतु सीके बाहेर निघण्याचा विलाज चालेना है किबे यास सांगितले. तेव्हा किबे बोलले की फितुर प्रकर्णी मजकुराची पत्रे माहाराज याजकडील कामगार याचे हाताने तयार करून लेहून घ्यावी. येविसी लाडविक साहेबापासोन तुमची खातरी करवितो. तेव्हा मी कबुल केले. नंतर साहेबाचे भेटीस साताऱ्याचे किल्यावर गेलो. बराबर सीताराम गोपाल खरसीकर होता व किबे याणी येक चपरासी दिल्हा होता. साहेबाची भेट होऊन साहेबानी सांगितले की बालाजीपंत किबे तुम्हास सांगतील त्या करावे. तुमचा बंदोबस्त कंपनी सरकारातोन करारा प्रो करविला जाईल असी खातरी केली. तो मा।र मी किबे यास सांगितला. तो त्याच संधीत गोविंदराव विठ्ठल दिवाण यास बंगल्यास नेले व किबे याने मजला सागितले की पत्रे तयार करून वर सीके करून अणून द्यावी. तेव्हा हा मजकूर भी हैबतराव बलवंत व विस्वनाथराव यास सांगितला, नंतर पत्रे काही बापुजी अनंदराव व मी व हैबतराव व विस्वनाथ ऐसे मिलोन लिहून किबे व बाबाजी कात्रे यास दाखविली. त्याणी सांगितले की कामगाराचे अक्षेरासारखी चिन्हे व सीके करून द्यावी. मग पत्रे विस्वनाथ याचे हवाली सीके व चिन्हे करावयास दिल्ही त्याने सीके व सही करून मला सांगितले की तयार पत्रे जाहाली, तुम्ही आपला बंदोबस्त करून घेऊन किबे यास पत्रे द्यावी. तेव्हा किबे यास सांगितले पत्रे सीक्यानसी चिन्हे वगेरे तयार जाहाली व सावकार याचे पत्राची नकल बालाजी कासी किबे याणी आपले खुद हते करून घेतली आणि मला सांगितले उद्या यावे. त्याजवरून किबे याजकडे मी दोन वेल गेलो. तेव्हा त्याने सांगितले की दाहा हजार रुपयाचे इनामगाव व पन्नास हजार रुपये बक्षीस व पाचशे रुपये पेनसील दरमहा ठराऊन देऊ. परंतु कार्य होई तो परंयेत मिलावयाचे नाहीत, पाच हजार रुपये खानगीस देतो. पत्रे द्यावी ती मी दिल्ही नाहीत, परंतु पत्रे द्यावी म्हणोन गणपतराव किबे याच्या चिट्या सर्वाज्ञिक अल्या आहेत. पुढे लाडविक साहेब याची बदली जाहाली. त्याजवर दोवीन साहेब रसीदंड अले. तेणे मजला बंगल्यात बोलावून नेले आणि बालाजी नारायण नातु व बालाजी कासी किबे हे उभयेता बसले होते त्याणी सांगितले की तुम्हास जे काम सांगितले होते ते अणुन द्यावे, तुमचा बंदोबस्त किबे बोलल्या प्रो। करऊन देऊ. या समयास तुम्ही दिल्हे असता तुम्हास कंपनी सरकारातोन जाजती बक्षीस दिल्हे जाईल. तेव्हा मी सांगितले की पत्रे मजवल नाहीत, विस्वनाथराव याजवल आहेत. तेव्हा किबे याणी आपला मेवणा विश्वनाथ यास बोलावणे विसी पाठविला. नंतर विश्वनाथ बंगल्यात गेला, नातु व किबे याची भेट जाहाली नाही. परंतु बालाजीपंत नातूचा कारकुन व बापाजी शेणवी है विश्वनाथ याचे घरी येत होते हे मजला समजल्यावरून त्याचे रुमालातील पत्रे तीन ३ व डौले सीके कोरे कागदावर केलेली दोन २ एकूण पाच पत्रे मी घेऊन आपले जवल ठेविली.
सही आत्माराम लक्षुमण ऊर्फ अपा सिदकर खुद दस्तुर
२. ता २८ अगटोबर सन १८३८ चे पुरसीसीतील हसील, पाच पत्रे मी विस्वनाथ याचे रुमालातील घेतली ती मी बराबर घेऊन पुणियास अलो आणि भाऊ लेले याचे बिराडी उतरलो, तेथे लेले याणी माझा रुमाल सोडून एक पत्र सावकार याचे नावाचे व येक विस्वनाथ याचे नावाचे ऐसी मजवल दोन होती ती काढून घेऊन पत्रावरील सीके कानून घेऊन आपले जवळ ठेविले, तो मी बाहेरून आल्यावर रुमालात पाहीले तो पत्रे नाहीत, तेव्हा भाऊ लेले यास विच्यारिले. त्याणी सांगितले की मी काही कारणास्तव घेतली आहेत, ती मी नीट ठेविली आहेत, तुम्ही साताऱ्यास जाल तेव्हा तुम्हाजवळ देईन, मजकडून वाकडेपणा होणार नाही. परंतु भाऊ लेले बाहेर कोठे जातात याचे सोधास लागलो तो मजला समजले की त्रिंबक माहादेव सदर अमीन याजकडून पत्रे इंग्रेजी सरकारात गुदरून आपले पोटाचा बंदोबस्त करून घ्यावा. नंतर मी सदर अमीन यास भेटून मजकूर समजविला, त्याणे सांगितले की भाऊ लेले आठ दिवस माझे मागे लागले आहेत. नंतर मी सदर अमीन यास सांगितले की ही पत्रे खोटी क्रीतीची आहेत व हा माणूस या प्रकर्णात वागतो हा किती साफीचा आहे त्यास जे करणे ते खरेपणा पाहून कराये. त्यानी सांगितले की आम्ही उभय सरकारची साफी व्हावी असे ठरविले आहे. तुम्ही अज्ञा हुजुराची घेऊन यावे व हा मजकूर जालेला सर्व सरकारास विदीत करावा. भाऊ लेले याणी गवर्नर साहेबास अर्जी खुद्द आपले स्वदस्तुर सहीची केली होती ती लेले याणी आपले चिरंजिवाचे हाते लेहून मुंबईस पाठवण्यास तयार केली, ती मी आपले हस्तगत करून घेतली. ती हाली मजवल आहे व पत्रे भाऊ लेले याणी घेतली त्याची पावती असल व कोरे कागदावर सीके केलेली कोरी डौले असी मजला विस्वनाथ याची चिटी भीम संबन्या व देवराम गुजराथी याजबरोबर सदशेची खुद स्वदस्तुरचे सहीची आली. सबब मी पुणियाहून विस्वनाथ याजकडे पाठविली.
सही आत्माराम लक्ष्मण उर्फ आपा सिंदकर खुद
३. अपा सिदकर यास विस्वनाथ याणी चिठी लिहिली की भीमा उंबरा पाठविला आहे. याजवल हिरे पाठवून द्यावे. येथे लिहिणार एक आणविला त्याजकडून तयार करून पाठऊन देऊ आणि हे काम मोठे, सबब युक्तीने जाले पाहिजे.
सही विश्वनाथ खुद
४. ३ नवंबर सन १८३८ विस्वनाथ रंगराव व हैबतराव बलवंत सिकारखाने व बापूजी अनंदराव याही फितुर खोटी पत्रे लिहिली व मजपासोनहि दोन पत्रे लिहविली आणि रुमालात ठेविली आणि हैबतराव व विश्वनाथराव व जानु भंडारी मिलोन सीके करून घेतले. ती पत्रे काही मी चोरून घेतली व डौले माझे जवल पुणियास होती ती विस्वनाथ याची चिठी आल्यावरून पाठऊन दिल्ही.
सही अपा सिंदकर खुद
५. ता ५ नवबर नस १८३८ तीन कलमाचे पुरसीसीचे उतरात साहेब व नातु व किचे याची रुजुवात करून देईन. परंतु साहेबाकडील कामगार याचे नाव घेतले असता माझे पारपत्य होईल. परंतु रुजुवात करून देईन व बालाजीपंत नातूची भेट व वोलख बालाजीपंत किबे याणी करून दिल्ही मग खात्री जाली.
सही अपा सिंदकर
६. खोटी पत्रे सरकार जामदारखान्यातून सीके चोरून फितुरी इंग्रेजी सरकार याचे कामगार बालाजीपत नातु व बालाजीपत किबे याणी सांगितल्यावरून हैबतराव व अपा सिदकर, व विस्वनाथराव व बापूजी अनंदराव व जानु भंडारी जामदार याणी केली. ती चौकसी करिता सापडली, त्या पत्रातील हसील मार खोट्या पत्रास तारीख २१ नवबर सन १८३६.
१. खोटे पत्र हैबतराव बलवत याचे हतचे मित्र कार्तिक शु १३ रोज शके १६३ दुर्मुख नाम सवत्सरे बाजीराव पंडित प्रधान पेशवे यास आज्ञा केली तुम्ही आपले गृहकलहामुळे इंग्रज आणिला आणि असावधपणे राज्य घालविले व स्वामित्व ध्यानास आणिले नाही, यास्तव राजाचा अभिश्राप तुम्हारा अला, तो दूर करणे असल्यास हुजुरचे पुरातन सेवक आपले पराक्रमाची शर्त करून कतल करीत आहेत. त्याची द्रव्याची वगैरे हरयेक विसी पुरवणी ठेवाल तरी अभिश्राप जाऊन तुमचे पद तुम्हाकडे करार राहील जाणिजे छ. ११ साबान, सदरहू खोटे सीका व मोर्तबसह आहे तर २१ नवंबर सन १८३६.
२. खोटे पत्र आत्माराम लक्ष्मण उर्फ अपा सिंदकर याणी स्वदस्तुरचे लिहिलेले. मि कार्तिक शु १३ इंदुवासर शके १६३, बापूजी अनंदराव यास की इग्लैंश लोकानी ह्या द्वीपावर येऊन मतलब करून सर्व राज्याचा अपहार करावा ही इच्छा धरून हस्तगत जाहले. त्यात बलाढ्यपणानी वागतात आणि हे द्वीप द्रव्येहीन करावे हे इच्छितात. सबब यास सिक्षा घडावी आणि राज्याचा बंदोबस्त व्हावा याजकरिता तुम्हास मुकत्यारी दिल्ही असे. तरी याचा बंदोबस्त तुम्ही मुखत्यारीने करावयासी प्राचीन दौलतदार संस्थानी गादीचे मालक व जमेदार वगैरे आहेत याची सर्वाची येकच वाट हा दुरदेशा चितास आणोन सर्वत्रानी येक नेहभाव ठेऊन धर्म राज्याची अभिवृध्वी होण्याकरिता साह्य करावयास सर्वांची समते घेऊन जे कार्यास साह्य होतील त्याचे मान व त्याचा आपला चालण्याचा तह ठरऊन देणे हा तुम्ही जसा ठरवाल त्याप्रमाणे तुम्ही मुखत्यारीने दस्ताऐवज करून घ्यावे ते हजुर सरकारात मंजुर असे. तुम्हास जे अनकुल होतील ते साह्यास घेऊन कलेल ते रीतीने धर्मराज्याची अभिवृद्धी करावी जाणीजे छ, ११ साबान. सदरहू खोटे पत्र सीका व मोर्तब सुधा असे.
३. खोटे पत्र बापूजी अनंदराव याणी स्वदस्तुर लिहिलेले मिए कार्तिक शु १३ शके १६३ दुर्मुखनाम सवत्सरे, अत्माराम लक्ष्मण देशकुलकर्णी तर्फ हिरडस मावल यास आज्ञा की तुम्ही राज्यातील पुरातन वर्तनदार स्वामी चाकरी येक निष्ठपणे करून राज्याचे उपयोगी पडत अला. सबब आज्ञा की हे सर्व राज्य इंग्लश याणी हरण केके याचे शासन करणे जरूर त्यास तुम्ही फौज पुरातन सरदार व हिंदुलोक व मुसलमान वगैरे विश्वासूक ठेऊन इंग्लश लोकाचे पारपत्ये करून स्वामीच्या धर्मराज्याचा उपयोग करावा. जसा उपयोग तुमचे हातून घडेल तसा तुमचा बदोबस्त करून दिल्हा जाईल. जो मुलूक तुम्ही कोबीज कराल त्याची वहिवाट तुम्हाकडे चालेल. तुमचे कडून घालमेल होणार नाही जाणिजे छ ११ सामान, सदरहू खोटे पत्र सीका मोर्तबसह आसे ता २१ नवंबर सन १८३६
४. खोटे पत्र बापूजी अनंदराव याचे हतचे मिए कार्तिक शु १३ शके १६३ त्यात मार की विश्वनाथ रंगराव पोतनीस यास तुम्ही स्वामीच्या राज्याची अभिवृष्यि तोच तुमचा उत्कृष्ट उदयकाल. तुम्हाविसी अंतर होणार नाही. तुम्हीच आपले ठिकाणी स्वामीत्व मानोन पेशजी अलाहिदा पत्र करून दिल्हे. त्या अन्वये उपयोग करून स्वामीच्या धर्मराज्याची अभिवृध्धी होय ते करणे जाणीजे छ ११ साबान. सदरहू खोटे पत्र सीका मोर्तब सह ता ११ सन १८३६.
५. कार्तिक शु।। १३ इदुवार शके १६३ दुर्मखनाम सवत्सरे या मितीचे खोटे पत्र बापुजी अनंदराव याचे हतचे. त्यात मा।र की समस्त सावकार लोक यास की इंग्लश लोक हे समुद्राचे बेटातील राहाणार याणी पृथ्वीवर येऊन मतलब करून सर्व राज्याचा आपहर करून है द्वीप द्रव्यहीन करावे हे इच्छितात. सबब यास सिक्षा घडावी आणि राज्याचा बंदोबस्त व्हावा. सबब हुजुरचे लोक हे कामास योजीले आहेत. त्यास तुम्ही अनकुल जाल्याखेरीज हे कार्य होणार नाही. याजकरिता तुमचा परंपरा स्नेह चालत अला तरी हुजुरचे लोकास तुम्ही द्रव्याचा पुरावा करून खते लिहून घेऊन लागेल ते द्रव्ये देत जावे. तुमचे पैक्याचा उलगडा व्याजसुधा हुजुरून केला जाईल अथवा जाहगीर लाऊन दिल्ही जाईल. तुम्ही तिलप्राय संशय न धरणे आणि पुन्हा हुजुरचे पत्राचा अक्षेप न करणे छ ११ साबान. सदरहू खोटे पत्र सीकामोर्तबसह ता २१ नवंबर सन १८३६.
६. खोटे पत्र बापूजी अनंदराव याचे हतचे मित्र कार्तिक श्रम १३ शके १६३ छ ११ साबान, समस्त सावकार लोक याचे नावे सदरहू पत्रात मा।र पाचवे नंबरात लिहिला आहे त्या प्रो सीका मोर्तब सुधा असे ता २१ नवंबर सन १८३६ इसवी.
येणे प्रो खोटी पत्रे लिहिली व कोरे कागदावर सीके व मोर्तबसह केली. परंतु पत्रे लिहून तयार किती केली व कोणाचे नावे किती लिहिली व कोणीकडे कसी कोणास दिल्ली व कोठे पा असतील हे नकले, व पुढे मतलब मनास येईल तो लिहिण्यास किती कोरे कागदावर सीके मोर्तब करून घेतली याचा नेम समजत नाही. येविसी चौकसी होत आहे त्यात ती सापडली असता ठीक, नाही पेक्षा पुढे आपेशाचे कारण आहे. असे प्रकारचे तुफान द्वेषानी बालाजी कासी किबे व बालाजी नारायण नातु याणी करविले असे.
७. हैबतराव बलवंतराय सिकारखाने याचे जबान्या व पुरसीसातील हसील मार
१. ता १६ नवंबर सन १८३८. लाडविक साहेब रसिदंड असता रदाक साहेब याणी भाऊ लेले यास नेऊन कागद लिहून देऊन करार केल्यावरून भाऊनी व मी तो कागद सरकारात अणोन दिल्हा. याजवर वोवीन साहेब अल्यावर बालाजीपंत नातु व बालाजीपंत किबे याणी अपा सिंदकर याचे हतून संधान करून रसीदंड बोवीन साहेबाची मी भेट घेतली अणी अपा सिंदकर व विश्वनाथ रंगराव व मी व बापूजी अनंदराव याणी पत्रे लिहिली, ती सीके न करिता नेऊन किव्यास दाखविली. ती बरी आहेत बोलले व सीके करून घेऊन येणे सांगितले की बालाजीपंत नातु बालाजीपंत किबे तुम्हांसी बोलल्या प्रो तुम्हास दहा हजाराचे गाव व लाख रुपये इनाम देऊ, खासे सीक्याची पत्रे तुम्ही अणोन देणे म्हणौन बोलले वगैरे मार.
सही हैबतराव बलवंत खुद
२. ता १७ व ता १८ नवंबर सन १८३८. गणपतराव किबे याचा व अपा सिंदकर याचा स्नेह. त्याजवरून अपानी मजला सांगितले की माझे व बालाजीपंत किबे याचे बोलणे जाले आहे. पुढे गोविंदरावजी दिवाण यास नेण्याचे पूर्वी अडिच तीन महिन्याचे सुमारे रात्रीस अपा मजला व विस्वनाथ यास घेऊन किबे याचे घरी गेला. ते समई किबे आम्हा त्रिवर्गास बोलले माहाराजावर काही ठपका येण्या जोग साधन तुम्ही करून द्याल की काय. इंग्रेजी सरकारचे व माहाराज सरकारचे वाकडे आहे सागितले, तेव्हा आम्ही सांगितले की आमच्यानी होईल तितके करून देऊ, आमचे पोटाचा बंदोबस्त करून द्यावा. तेव्हा किबे बरे आहे असे बोलले. पुढे आठचार रोजानी किबे याणी माझी व अपाची लाडकि साहेबाची भेट करून दिल्ही. नंतर साहेबानी सांगितले की माहाराजाचे सीक्यानसी फितुराचे दस्ताऐवज तुम्ही करून द्यावे, किबे तुम्हा जवल बोलले आहेत त्याजप्रमाणे मजकडून करार आहे. किबे याचा आमचा करार की दहा हजार रुपयाचे गाव इनाम व येक लाख रुपये बक्षीस, याचा दस्तऐवज रसीदंड याही आपले सहीचा द्यावा अगर गवनर कौसलचे सहीचा द्यावा, असा करार होता. नंतर लाडविक साहेब याची बदली जाहाली, त्याचे जाग्यावर वोवीन साहेब आले. तेव्हा बालाजीपंत नातु व बालाजीपंत किबे याचा निरोप आपा सिंदकर याजबरोबर आला की तुम्ही भेटून जावे, तेव्हा मी व अपा सिंदकर व किबे मिलोन बंगल्यास साहेबाकडे गेलो. तेथे नातु व दोवीन साहेब होते. त्या वेली नातु व किबे व दोवीन साहेब या तिघानी मजला सांगितले की तुम्ही जवाहीर खान्यात असता. सीके तुम्हा जवल आहेत, त्यास कोणी लोकाचे व आपले मंडलीचे हरयेक पत्र माहाराजाचे नावे संत्री सुधा लिहून त्याजवर खास सीका करून अणून द्यावे, त्यात तुमचा उपयोग फार होईल. आम्ही माहाराजाचे राज्ये युक्तीने घेतो. तुम्ही येश द्यावे असे बालाजीपंत नातु बोलले की माझे प्रो तुमचा इतमाम चालेल, दाहा हाजार रुपयाचे इनामगाव व येक लाख रुपये बक्ष गीत देऊ आणि माहाराजाची तोसीस लागू देणार नाही. ही गोष्ट तुम्ही कोणापासी बोलू नये. जर बोलल्यास हरयेकविसी तुम्हास जड जाईल, असे सांगून मजल रजा दिल्ही
सही हैबतराव याची सुद
३. ता २३ नवंबर सन १८३८ अपा सिंदकर याणी मजला सांगितले की सरकार जामदार खात्यातोन सीका काढोन द्यावा म्हणजे इंग्रेजी सरकारातोन बालाजी कासी किबे तुम्हास दाहा हजार रूपयाचे गाव देतो म्हणोन बोलले आणि किबे याणी सागितले आहे व गणपतराव किबे याचा व अपाचा हे. त्याचा निरोप सांगितल्यावरून मी कोरे कागदावर डौले म्हणजे सीके केले. लिहिण्यास फितुरी प्रकर्णीबद्दल सुमार १५ व फितुरी पत्रे दहा अकरा तयार केली. त्या पत्रावर सीके करण्यास हुकुम विश्वनाथराव याणी केला. जवल बापूजी अनंदराव व अपा सिंदकर होते, सीका जानु भंडारी जामदार याणे दिल्हा, तो मी घेऊन कोरे कागदावर व पत्रे लिए त्याजवर सीके काहीकावर मी केले व काहीकावर विस्वनाथ याणे असे केले. त्यात दोन पत्रे बापूजी अनंदराव व याणे नेली.
बाकी मजवल माझे घरी होती ती अपा सिंदकर याणी चोरून नेली आणि विस्वनाथ याजवल दिल्ही, त्यातील येक पत्र व कोरे कागदावर सीके केलेली दोन कागद अपा सिंदकर व विश्वनाथ याणी फल्यात घालून मी मुंबईस जाते समई मजवल दिल्या. त्या फल्या माहीम मुंबई येथे लक्षुमण ब्राम्हण याजवल दिल्या आहेत. तो तेथेच आहे. बाकीची पत्रे सीके कोरे कागदावर केलेली विस्वनाथ याजवल आहेत. विश्वनाथ याचे घरी अपा सिंदकर याणी व विस्वनाथ याणी वाटून घेतली, ती त्याणे कोठे ठेविली ती मजला माहीत नाहीत. जामदारखान्यात चोरी होऊन दागिने व पैका व मोती व जव्हाहीर याच्या टिपा बापूजी अनंदराव याणी फिरविल्या व अपा सिंदकर याणे जमाखर्च खोटे पुरे करून शपत केली की कोणी कोठे बोलू नये, व जानु भंडारी जामदार हा लफापाचे चोरी बाबद पाहाच्यात होता. तेव्हा अनंदराव रेटर यासी मी पुसीले की आमचा सोबती सोडून द्यावा. तुम्हास सीक्याचे पत्र देऊ.
तेव्हा रैटर बोलला की सीक्याचे पत्र मिलाल्यावर आम्हास अक्षेराची गरज नाही. मग मी व विस्वनाथ याणी जानूस मिकी बरोबर निरोप पाठविला की सीक्याचे पत्र देऊन तुजला सोडऊन घेतो. तेव्हा त्याणी निरोप पाठविला की माझे डोचके जाऊ लागल्यास सोडवून घ्यावे. पुढे मी मुंबईस जाण्याचे संधीस अपाजवळ पत्रे सीक्या नसी तयार आहेत ती साहेबास अपा सिंदकर देणार, म्हणोन सीताराम गोपाल खर्सीकर याणे मजला सांगितले. त्यावरून मी अपास सांगून पत्रे देऊ दिल्ही नाहीत. परंतु अपानी चोरी केली. सबब आपला जीव बच्चावयाकरिता देतो असे वाटले. नंतर अपा सिदकर य भाऊ लेले पुर्णियास गेले व मी ही पुनियास अलो. तेव्हा अपास भाऊ लेले याणी सांगितले की बलवंतराव चिटणीस परजात आहेत, त्याचे तारखे सारखी तारीख अक्षरे लिहिणार मेलविला आहे, तो करून देतो तेव्हा मीही कबूल त्यास जालो पेनसील करून घ्यावे व माहाराजानी जर मजला पैका दिल्ह्यास मी हे पुन्हा उलटवीन म्हणोन भाऊ लेले याणी सांगितले.
सही हैबतराव याची खुद.
४. ता २३ नवंबर सन १८३८ चे यादीतील हसील. मी सीपाई लोक याजवल रडलो य अरडलो, जेवीत नाही बोललो, दंगा केला, याचे कारण इंग्रजी सरकाराचे कामगार याणी मजला सांगितल्यावरून हे कृत्ये सीके वगैरे मी केले. याजविसी माहाराज सरकारची मजला जरब वगैरे काही एक नाही, परंतु माझे कसे होईल या भयाचे कारण इंग्रजी सरकारचे कामगार काय करतील. ते जबरदस्त आहेत. त्याणी मजला करावयासी सांगितले. त्यासी रुजवात समक्ष करून देईन. ते जबरदस्त आहेत सबब भय वाटत आहे. परंतु तोडावर रुजु करून देईन व सदरहु मजकूर मी आपले अकल हुशारीने लेहून दिल्हे आहे.
सही हैबतराव बलवंत हस्तअक्षर खुद
साक्षे
१. गोपालजी मोरे हवालदार रिसाला
सिकदार हस्त अक्षेर हैबतराव बलवंत
१. चंदी प्रसाद नाईक रिसाला सिकदर हस्ता
अक्षेर हैबतराव बलवंत
१. दाजी कदम हवालदार नि सिविका माहल
हस्ता अक्षेर खुद
१. सदरहू हैबतराव याणे लिहून दिल्ह्या प्रो
साक्षे रंगोजी मोहिते हवालदार किले सातारा
८. विस्वनाथ रंगराव याचे जबान्यातील वगैरे हसील मार १. ता २८ नवंबर सन १८३८ आपा सिंदकर हा आमचे पासी माहराज सरकाराचे जव्हाहीर खान्याचे कामावर आहे. त्याचे जाणे बालाजी कासी किबे याजकडे आहे. तो सन सदा सलासीनचे अशाडमासी सन १८३६ साली किबे याजकडून लाडविक साहेब रसिदंड यास भेटून मला सांगितले की साहेबाचे व किबे याचे व माझे बोलणे होऊन त्याजवल आम्ही फितुराचे काम करितो म्हणोन कबूल केले आहे.
तुमचे हातोन येकादे काम करण्यासारखे असेल ते करावे. त्यास मी सागितले की करण्यासारखे असेल ते करू. मग आपा सिंदकर याने सांगितले की माहाराज सरकारचे व इंग्रेज सरकारचे वाकडे आहे. त्यास फितुरी मजकुराची पत्रे लेहुन त्याजवर सरकारी खासे सीके करून द्यावी, अगर सीके मागतात ते त्याचे हवाली करावे, म्हणजे आपला उत्तम प्रकारचा बंदोबस्त करून देणार.
त्याज वरूर मी हैबतराव सिकारखाने यासी सीके हस्तगत होण्याचा प्रेयत्न केला, परंतु सीके हस्तगत जाले नाही. तेव्हा आपा सिंदकर यास सागितले की सीके बाहेर निघत नाहीत, त्यास आम्हास पत्र तयार करून त्याजवर सीके करून द्यावयासी सागाल तर करून देऊ, नंतर आपा सिंदकर हे बालाजीपंत किबे यास विच्यारून अला सागितले की पत्रे सीक्यानसी फितुरी तयार करून दिल्ही असता इनामगाव रुपये १०००० हजार बक्षीस रुपये ५०००० व पेनसील दरमहा रु. ५०० आम्हास देणार, तेव्हा आम्ही कबूल करून मी व हैबतराव व आपा सिंदकर व बापूजी अनंदराव ऐसी चौघे जणानी फितुरी पत्रे लिहून तयार केली आणि जानु भंडारी जामदार यास आम्ही आपले मिलाफत घेऊन सीके जामदारखान्यातील पेटीतील काढून घेऊन पत्रावर सीके करून आपा सिंदकर यास सागितले की तुमचे काम तयार आहे.
करारा प्रो बदोबस्त करून घेऊन पत्रे बालाजीपंत किबे याचे हवाली करावी. नंतर आपा सिंदकर बालाजीपंत किबे याजकडे जाऊन त्यास सांगितले, तो लाडविक साहेब रसीदंड याची बदली जाहाली, त्याजवर चौधीन साहेब अले, तेव्हा अपा सिंदकर यास बंगल्यात बोलाऊन नेऊन वोवीन साहेब व बालाजीपंत नातु व बालाजीपंत किबे याही सांगितले की लाडविक साहेबाचे वेलेस सागितले आहे ते जाले असल्यास द्याये. तेव्हा अपा सिंदकर याने सांगितले की ती पत्रे विश्वनाथ याजवल आहेत.
मग मजला बालाजीपंत किबे याणी आपला मेवणा बोलावयासी पाठविला. तेव्हा मी किबे याचे घरी गेलो त्याची भेट जाहाली नाही, म्हणीन बंगल्यात गेलो. परंतु माहराजास माझी बातमी गेल्याची लागली. सबब मी पुन्हा गेली नाही. अपा सिंदकर याचा जाण्यायेण्याचा रफ्त होता.
सही विस्वनाथराव रंगराव खुद
२. ता ६ नवंबर सन १८३८ चे पुरसीसीत लेहून दिल्ही की हैबतराव व भाऊ लेले व अपा सिंदकर या त्रिवर्गाचे सागण्यावर भी रुकार दिल्हा. मुख्ये हैबतराव याचे विस्वासावर गेलो. जानु जामदार याज पासून हैबतराव याणी सीके घेऊन खोटे पत्रावर सीके केले व त्रिवर्ग बोलले की हे काम जाल्यावर मोठा उपयोग आहे बोलले.
सही विस्वनाथराव खुद
३. त ६ नवंबर १८३८ हैबतराव व भाऊ लेले व अपा सिंदकर बोलतात की सौद्याचे लस्करात अथवा सीकाकडे अशा गफा त्रिवर्ग करून मजवल कर्ज मागत होते, परंतु मी दिल्हे नाही.
सही विस्वनाथराव खुद
४. ता ६ नवंबर लाडविक साहेब रसीदंटीवर असता हैबतराव व भाऊ लेले व अपा सिंदकर जात होते. पुढे वोवीन साहेब अल्यावरही जात होते.
सही विस्वनाथराव
५. ता ७ नवंबर सन १८३८ तीर्थरुपाचे हतची जबानी लिहिलेली मला मंजूर आहे. जो मजकूर होत गेला तेच त्याणे लिहून दिल्हे.
सही विस्वनाथराव
९. रंगो महिपत याणे लिहून दिल्हे त्यातील हसील मार
२८
१. ६ नवंबर सन १८३८ रोजी लिहून दिल्हे त्यात हसील की विश्वनाथराव व बापूजी अनंदराव व हैबतराव व अपा सिंदकर येकुण च्यार असामीनी खोटी पत्रे केली.
सही रंगो महिपत
२. ता ७ नवंबर सन १८३८ छ २० सावानी रंगो महिपत कारकुन याणी लिहून दिल्हे त्यातील हसील मजकुर की जवाहीर खान्याचे लिहिणे करीत असतो. परंतु माझे शेरीरी समाधान नाही, सबब माझा लेक विस्वनाथ व अपा सिंदकर व हैबतराव सीकारखाने मी आपले तर्फेने असे ठेविले. ह्या कारकुनानी भाऊ लेले वाईकर व जानु भंडारी जामदार याणी जामदारखान्यात बसोन खलबते प्रहर प्रहर रात्र पर्यंत करीत होते असे माझा लेक विस्वनाथ याणे मजला सांगितले.
पुढे कारकुनानी माझा लेक विस्वनाथ यास आपले मिलाफास घेऊन खोटी पत्रे व सीके मोर्तब करण्यास सामील करून केली व हैबतराव व अपा सिंदकर हे किबे याचे मार्फतीने लाडविक साहेब रसीदंड याजकडे जात होते असे माझे लेकानी मला सांगितले. पुढे गोविंदराव दिवाण बंगल्यात रसीदंडानी नेल्यावर किबे हैबतराव व अपा सिंदकर यास बोलले की तुम्ही साहेबासी करार केला आहे, त्याप्रो दस्ता ऐवज करून द्यावे म्हणजे तुमचे बोलण्या प्रो साहेब काम करतील, हाही मार विस्वनाथ याणी मजला सांगितले. नंतर दुसरे साहेब अले तेव्हा नातूही पुणीयाहून अले. त्याजकडे हैबतराव व अपा सिंदकर जात असता या मिलणीत माझा लेक विस्वनाथ नाही असे म्हणवत नाही. जे काम केले ते सारे होऊन खोटे फितुरी कागद केले, त्यात विस्वनाथ व हैबतराव व अपा सिंदकर व भाऊ लेले व बापूजी अनंदराव व जानु भंडारी जामदार याणी मिलून खोटे काम केले. ही वर्दी सरकारास मी दिल्ही नाही हा आपराध माझा आहे वगैरे मार.
सही रंगो महिपत खुद
३. ता १२ नवंबर सन १८३८ रोजी लिहून दिल्हे त्यात हसील की सीताराम गोपाळ खर्सीकर हा मजपासी बोलत होता की अपा सिंदकर पाचवडास जाऊन बालाजीपंत नातुसी भेटून त्याची याची खलबते श्रीमहादेवाचे देवलात जाले, हे मी पाहिले व पुण्यात सावकार याजपासी पत्रे गहाण पंधरा रुपयास अपा सिंदकर याणे ठेविले असे सीताराम म्हणत होता. येविसीची रुजुवात त्याचे मुखावर करून देऊ म्हणौन
सही रंगो महिपत खुद
१० ता २९ नवंबर सन १८३८ रोजी जानु भंडारी जामदार याणी लिहून दिल्हे त्यातील हसील मार आपा सिंदकर व विश्वनाथराव व हैबतराव व बापूजी अनंदराव याणी फितुरी पत्रे लिहून तयार केली आणि मला म्हणू लागले की सरकारी सीका आमचे जवल द्यावा. तेव्हा मी त्यास बोललो की सीका तुम्हाजवळ द्यावा असा हुकुम मला नाही व मजजवल किली सिक्याचे पेटीची नाही, तेव्हा विस्वनाथ बोलला की सरकारी हुकुमाची गरज नाही. आपा सिंदकर याणी इंग्रजी सरकारास पत्र फितुरीची करून द्यावी आणि आपण बक्षीस इनाम गांव व पेनसील करून घ्यावे असे बालाजीपंत किबे याजकडून साहेबाची भेट घेऊन ठरविले आहे. त्याजवरून पत्रे तयार केली आहेत त्याजवर सीके करून दिल्हे म्हणजे आपला बंदोबस्त चांगला होईल, तुजला हिसा देऊ, यासी अंतर करणार नाही असी माझी खात्री केली.
आणि सीका आम्हास दिल्हा असे कोणापासी आम्ही बोलणार नाही असी माझी खात्री केली. मग मी हवालदार यास दुसरे दागिण्याची सबब सांगून त्याजपासोन किली पेटीची घेऊन सीका काढून विश्वनाथ याचे हवाली केला. त्याणे सीके पत्रावर करून परंतु सीका माझे हवाली केला. सीके पत्रावर केले ती पत्रे त्याणी कोणास दिल्ही किंवा आपले जवल ठेविली हे मजला माहीत नाही.
सही जानू भंडारी हस्ता आक्षेर वामन मोरेस्वर
देशपांडे प्रांत वाई हली मु।। सातारा
११. ता २९ नवंबर सन १८३८ सीताराम गोपाल खरसीकर याणे लिहून दिल्हे त्यातील हसील मार, आपा सिंदकर व हैबतराव व विस्वनाथ व बापूजी अनंदराव याणी खोटी पत्रे आपले हाताची लिहून त्याजवर सरकारी सीके खासे केले त्याचे कारण माझे पाहण्यात व ऐकण्यात आहे. व आपा सिंदकर मजला सातारा किल्यावर श्री देवीचे दर्शनास जाणे आहे सबब मजला बराबर घेऊन गेला आणि आम्ही दोघे खाली बसोन चपरासी याजबरोबर निरोप पाठविला की बालाजी कासी किबे याजकडून कारकुन आले आहेत.
तेव्हा चपरासी साहेबाकडे जाऊन पुन्हा बोलावयास अला ते समई अपास चपरासी घेऊन गेला. मजला सांगितले की खाली बसावे. मग मी गेलो नाही. आपा लाडविक साहेबाकडे जाऊन खाली अले आणि मला मार सांगितला की साहेबास मी सांगितले की बालाजीपंत किबे यानी आम्हास पाठविले आहे. त्यास आम्ही सरकारी काम करितो, आमची हुकमत कामाचे योग्यते प्रो वाढवून किबे याणी ठरवून दिल्ह्याप्रो बंदोबस्त कुपनी सरकाराहून व्हावा, त्याजवरून साहेब बोलले की बालाजीपंत किबे सांगतील ते काम तुम्ही करावे, किबे ठरवून देतील त्या प्रो बंदोबस्त होईल.
तुम्ही मनात काही आदेशा न आणिता काम करावे. याप्रो आपा सिंदकर याणी मजला सांगितले. पुढे गणपतराव किबे बालाजीपंत किबे याचे पुतणे याणी माझे बराबर आपास पत्रे व निरोप सांगितले की खोटे सीके आपा देतील ते अणून यावे व पत्रात महार सवज्ञेचा लिहून देत असत ती पत्रे व निरोप मी आपा सौंदकर यास मी पावते करीत होतो. त्याजवर सीके बाहेर निघण्यास सवड पडत नाही सा। च्यार असामीनी खोटी पत्रे लिहून त्या पत्रावर सीके केले. परंतु ती पत्रे अपा सौंदकर याणे साहेबाकडे अथवा बालाजीपंत किबे यास दिल्ही किंवा नाहीत हे माहित नाही.
सही सीताराम गोपाल खुद
१२. ता ५ नवंबर सन १८३८ अजीजखान हकमीमजी (हकीमजी) याणे लेहून दिल्हे त्यातील हसील, हैबतराव सीकारखाने यास चोरानी पेशजी तोडले होते. त्याजवरून मी त्याचे घरी जखमा बांधावयासी जात होतो तेव्हाचे त्याची माझी वोलख होती. पुढे गोविंदरावजी नगरास नेल्यावर पाच प्यार महिन्यानी हैबतराव व विस्वनाथ रंगराव याणे मजला घरास विस्वनाथ याचे नेऊन सांगितले की तुम्ही हैदराबाजेस काही पठाण दूर जाले आहेत ते येतील की काय. तेव्हा मी सांगितले त्यास नवकरी मिलते तेव्हा का न येतील. तेव्हा मला सांगितले की तुम्ही जाऊन जितके पठाण असतील तितक्यास घेऊन यावे.
नंतर मी त्यास सांगितले त्यास खर्चास पाहिजे. तेव्हा मला सांगितले की तुम्हास घोडे व खर्चास व पठाणास ऐवज देऊ तुम्ही जावे. मग मी सांगितले की कागद पत्र दिल्हबास मी जाणार नाही. इंग्रेजी सरकार वाटेने झाडे घेतील. कागद नसल्यास जाईन.
सही अजिजखान हकीमजी
१३. ता ४ नवंबर सन १८३८ बालाजी लक्ष्मण कारकून नि पोते याणी लिहून दिल्हे त्यातील हसील, गुदस्ता माघ मासी सीताराम गोपाल खरसीकर याणी सांगितले की विस्वनाथ रंगराव व हैबतराव याणी पत्रे फितुरी खोटी तयार करून व कोरे कागदावर सीके केले आहेत. तेव्हा मी सांगितले तसे केले. तेव्हा त्याणे सांगितले सीके कटार बाहेर काढली होती ते समई जामदार कोण होता है नकले. कागद कोठे आहेत तेव्हा त्याणे सांगितले की येक येकापासी सीक्याचे दोन दोन कोरे कागद व तीन च्यार पत्रे लिहिलेली या प्रमाणे आहेत.
ती नजरेस पडावयाची नाहीत. आपा सिंदकर याजपासी आहेत, तुम्ही त्याजपासी विच्यारले असता तुम्हास कलेल तेव्हा मी अपा सिंदकर यास विच्यारले, त्याणी सांगितले की हैबतराव याजवल पत्रे आहेत. नजरेस पडावयाची नाहीत. नंतर सीताराम गोपाल याणी सांगितले की आपा सिंदकर याजवलच आहेत. पुढे चैत्रमासी भाऊ लेले अले त्यास मी सांगितले की हा जिनस आपा जवल आहे. तुम्ही त्याचा सोध करावे धरावे त्याजवर आपा व भाऊ पुणियास गेले आणि येक बिराडी राहिले आणि मजला सुचना पाठविली की जिनस हस्तगत जाला. नंतर भाऊस मी सांगून पाठविले की तुम्ही साताऱ्यास यावे. तेव्हा भाऊ लेले साताऱ्यास अले. नंतर मी त्याजला बिराडी नारी सीवजी पीलखाने याचे घरी ठेविले आणि नाना कडून बाबा वैद्य यास कलऊन सरकाराचे कानावर घालविले.
सही बालाजी लक्षुमण कारकुन नि पोते सही खुद
१४. ता. ५ नवंबर सन १८३८ श्रीधर बीन बापु कुडालकर याणी लेहुन दिल्हे त्या हसील. खोटी फितुरीपत्रे करून त्याजवर सीके कोणी केले हे मजला माहीत नाही. परंतु चैत्रमासी भाऊ लेले हे मजपासी बोलत होते की पुण्यात खोटी पत्रे तयार जालेली मी धरून ठेविली आहेत व हैबतराव सीकारखाने याजकडे जामदारखान्यांत अजीजखान हकीम येत जात होता व कांही रुपये खर्चास मागत असे व दोघे बोलत असत.
सही खुद श्रीधर बीन बापु कूडालकर सही
१५. मि भाद्रपद वा ६ आपा सिंदकर यास नारू वडुजकर याणी पत्रे लिए त्यात हसील मजकुर की आपण सांगितल्या प्रो मजकुर सांगितला. त्याणी सांगितले की पत्रदर्शनी जसे असाल तसे येणे. युक्तीच्या वाटेने येऊन आम्हास भेटावे, नंतर जो मजकुर ठरणे तो ठरऊन आपले बच्चावाची तजवीज करू. त्याणी आम्हास दोन च्यार गोष्टी चांगल्याच सांगितल्या. यास्तव आपण त्वरा करून पत्रदर्शनी इकडे निघोन यावे. तेथे बिराडी इकडे येण्याची वार्ता कलऊ नये. वाटेने मोठ्या तजविजीने यावे. इकडील तिकडील मजकुर भेटी अंती कलतील. येण्यास मात्र क्षणाचा विलंब न करिता जरूर यावे म्हणौन पत्र
सही नारायेणराव बजकर दस्तुर खुद
१६. मि।। अशाड शु।। ७ त्रिंबकपंत कुलवेसकर यासी मोरोपंत साठे याणी साताऱ्याहून पुणियास पत्र लिए त्यातील हसील मार हाली आपणाकडे भाऊ लेले पाठविले आहेत तरी याचे काम मनावर घेऊन आपण करावे. यैविसी आपली काही नुकसानी नाही आणि आम्ही आपली नुकसानी करणार नाही येविसी खात्री आपणास असावी आणि आम्हासही आहे. तूर्त आपणास खर्चास रुपये १०० शंभर पाठविले आहेत ते घेऊन पुढे याचे काम जालीयावर हे आपणास येक हजार रुपये देतील असी हे आपले नावाची चिटी लिहून देतील ती घ्यावी आणि मशारनिल्हे याचे काम हे सांगतील त्याप्रमाणे मजकुराची दोन तीन पत्रे लेहून द्यावी. वरील सही वगैरे येथे सर्व तयार आहे.
या कामात आपली काही नुकसानी नाही आणि तुमचा आमचा उभयेताचा यात उपयोग आहे जागोन लिए आहे. तरी हे काम मनावर घेऊन आपण अगत्य करावे. आम्ही येथे हरण साहेबाकडे जातयेत असतो. परंतु अद्याप रोजगार नाही. परंतु पुढे काही होईल असे दिसते. या सुमारास आपणही येथे अल्यास काही थोड्या दिवसात मोठे काम मिलेल. सारोप लेले याचे काम आपण केल्याने आपल्यास मोठे काम मिलेल म्हणौन पत्र.
सही मोरोपंत साठे दस्तुर खुद
१७. बालाजी कासी किबे है कंपनी इंग्रजी सरकारचे कामगार याचे पुतण गणेश लक्षुमण किबे याणी अपा सिंदकर खोटी पत्र फितुर प्रकर्णी करणारे यास पत्रे लिहिली ती किबे याणी आपले स्वदस्तुर सहीची पाठविली त्यातील मजकुर
१. ता।। किबे याणी पत्र लिहिले त्यात हसील मजकुर. मी अताच काही कामाकरिता गावी गेलो. आपण उदईक जाणार म्हणीन ऐकिले, तरी जाणे न व्हावे. मी कार्य उरकोन गुरुवारी अगर शुक्रवारी येईन. मंगलवारी माहुलीस येईन. माहुलीस अल्यानंतर उभाउभी आपने भेटीकरिता येऊन भेट मंगलवारी अगर बुधवारी जरूर घेईन (कलम १). इतक्या उपरी आपले जाणे जरूर असल्यास आपले कामाविसी बाबाजी कात्रे आमचे येथे असतात त्यास सांगोन ठेविले आहे.
ते आमचे पुरे विश्वासुक आहेत. जिनस त्यास दाखऊन त्याची खात्री जाल्यास मला सुचना लिहितील म्हणजे मीही येईन. सदरी लिहिल्या मजकुराविसी त्या ग्रहस्तबदलचा आदेशा किमपी न घ्यावा. मी आहे असे जाणौन त्यास कचा मार समाजाऊन द्यावा (कलम २). आपले काम व्हावयाचे होते ते जाले असल्यास मी काल विनंती केल्याप्रमाणे ५० पनासीचे काम करावे. रुपये बाबाजी कात्रे यांजपासी आमचे घरी द्यावे अगर पुराणिक बाबा याजपासी द्यावे अगर स्थानापा बारटके सिंपी बलवंतराव चिटणिसाचे घराचे अलिकडे राहतो त्याचे दुकानी आमचे नावे जमा करावे, कसेही करून देवडे कार्य करावे दिकत अणू नये ज्यापाशी यात त्याजपाशी मोघमच द्यावे. त्याचा तपशील काही सांगु नये.
आपला भरवसा जाणोन लि।। आहे (कलम ३) जे समई परत पाहिजेत असी गरज लागेल तेव्हा अधी महिना पंधरा दिवस सुचना द्यावी म्हणजे परत होतील सारांष दोन कलमे लिहिली आहेत याची दिकत न अणीता अगत्यवादे करावी. अनमान करू नये. (कलम ४) बापुसाहेब उदईक आल्यास आमचे रामराम प्रा।। करावे. मंगलवारी आम्ही उभाउभी भेटीस येऊन जाऊ. नंतर माहुली दोन तीन रोज लागतील. गुरुवारी अगर शुक्रवारी परयेंत येऊ आपण जाणे न केल्यास बहुतच उत्तम आहे. बापूची आमची ही भेट होईल. आपण सर्व जाणत आहा. त्याहावे असे नाही, म्हणौन पत्र कलम ५.
सही गणेश लक्ष्मण किबे दस्तुर खुद
२. मि।। फाल्गुण वा। १३ शुक्रवार किबे याणी लिहिले त्यात हसील मजकुर. आपण गेल्यातागाईत पत्र येऊन मजकुर समजत नाही. तरी असे नसावे. वरचेवर पत्र पाठऊन समाचार घेत जावा (कलम १) इकडील मा।र तर राजश्री नारायणराव व बापू सांगता कलेले जो मार जाला यास मी घराचा मुखत्यार असतो तर चिंता नवती माझे पारपत्य करण्यास तूर्त वडील आहेत (कलम २) समय तर अला. गोष्ट होऊन गेली.
असो याचा शेवट नीट होऊन माझी आबरू संवरक्षण करून जीव बचवावा असे दोस्ताचे चितात असल्यास, जलद ऐवजाची तोड जोड करून ऐवज नारायेणाजवल द्यावा. तपशीलवार मजकुर सीतारामपंत याणी सांगितलाच असेल त्याज वरून समजलेच असेल म्हणोन पत्र कलम ३.
सही गणेश लक्षुमण किबे दस्तुर खुद
३. मि।। श्रावण शुा। ७ किबे याणी आपा सिंदकर यास लिहिले त्यात मा।र की आपण गेले ते समई जो करार केला तो चांगला सिधीस गेला. असो श्रीमान लोकास पामराची केवल दया येऊन त्यास या संकटातून पार पाडतील हे अलंक्षे (?) (कलम १) परंतु श्रेहभाव आपण आला ते समई आपणापासी जालेला वृतांत कलऊन आझे प्रो कार्य जाले अगर न जाले है। परमेश्वरास माहीत असेल. (कलम २) सातारचे लोकांस तरी जाहीर जालेच आहे असे असता परिणामी या तऱ्हेच्या गोष्टी व प्रमाणिकता काय होती ती कलोन आली. (कलम ३) हाली आमचे तीर्थरूप आले आहेत.
पंधरा दिवस जाले. पुढे आम्हास कोणत्या रीतीने पार करित, ते लिहिण्यात यावे अगर स्नेहभाव केसाने मान कापावयाची असल्यास तसेच उत्तर स्पष्ट यावे. पुन्हा पत्र लिहिण्याच्या सुधा संकटात मला घालू नये. (कलम ४) निमेसिने कार्य व्हावे या जोगे असल्यास नारायणा समागने पाठऊन द्यावे. आपण बोलला होता तितक्याने अता नड दूर होती असे नाही आणि तेच बोलणे असल्यास पाठवण्याची गरज नाही. (कलम ५) पनासाने कार्य होणार नाही आणि आपली मर्जी कशास खदू करावी.
आपले कार्य न होता येखाद्यास थोडक्याने खटू करावे व त्यानी म्हणत असावे की आम्ही मोठा उपकार केला, असी रीत आमची नाही. (कलम ६) सारांष येकंदर मुक्त करावयाचे चितापासून असल्यास करावे. नाही तर थोडक्याने उपकार होऊ नये. कार्य घडून लौकर यावे. (कलम ७) सुज्ञ जाणत आहा. पेच ग्रेकावर येतो असे नाही. सर्वाची असीच दशा आहे. भरवसा दिल्ह्याने कोणी बुडवणार नाही असे नाही, परंतु विश्वासघात करणारेने विच्यार करून करावा. कलावे खटला तुटक लौकर करणे.
सही गणेश लक्षुमण किबे दस्तुर खुद
१८. अत्माराम लक्ष्मण उर्फ अपा सिदकर याचे नावे पत्रे
१. मि।। फाल्गुन शु।। ५ चे विशेष, आपण गेल्या तागाईत काहीच मजकुर समजण्यात येत नाही. तरी ऐसे न करिता कोणत्या रीतीने आपले वर्तमान समजेल ते करावे. यानंतर इकडील अधिकोत्तर मजकुर आहे तो डाली ग्रहस्त आपणाकडे मुदाम पाठविले आहेत. हे तपसीलवार सांगता समजण्यात येईल.
१. आपण गेल्यानंतर जालेल्या माराचा तपास करावया करित मारनिल्हेस नेऊन दोन तीन रोज परयेत नेऊन ठविले होते व मारनिल्हेस तसदी बहुत केली. परंतु ते न सांगते व बोभाट बहुतच होऊ लागला. याजमुले कोणी ग्रहस्तास मध्ये वीस घालून मा।। रनिल्हेवरचा मुदा मी आपल्यावर घेऊन आहे. हे वर्तमान आपणास कलावे यास्तव सदरहू कलमाचा टपका मी जातीने घेऊन मशारनिल्हेस तुम्हाकडे सा केले आहेत.
२. या मजकुराचा ठराव होऊन कार्य सिद्धी जाल्या नंतर तुमचे आमचे बोलणे स्नेही ग्रहस्ताचे माडीवर जाले, त्या कराराचे स्मर्ण करून डाली ग्रहस्त पाठविले आहेत याजसमागमे कार्य करून पाठवावे आणि आपले येणे इकडे जाले म्हणजे ज्याजकडून आमचे कार्य करून देविणार होता त्याजकडून आपणच घ्यावे. परंतु तुर्त यासमई माझी आस सवरक्षण करावी.
असे दोस्तीचे इराद्याने लक्षात वागत असल्यास आपण खुद कसेही करून दिल्ह्यास लज्या संवरक्षण होते. मी ल्याहावे असे नाही. सर्व गोष्टी आपले चितात वागतच असतील. सुज्ञच आहा. परंतु जाते समई तारल्यास जातो असा निरोप सागौन तिकडे निघोन गेला. याजवरून नेहाचा कटाळा अला असा वाटतो. यास आपला दोष नाही बहुत दिवस अति नेह चालला म्हणजे काही तरी कोणत्याही निमिताने विघ्न येते. जिवलग मित्रता ईश्वरासच पाहावत नाही, परंतु मनुष्याने सारासार विच्यार पाहून मनुषे पाहून कपट ठेविल्यास चिता नाही. कपट्यासी कपटी ने खपतो, परंतु निष्कपट्यासी कपट केले असता बहुत खेद होतो.
तरी असे न करावे. इतके दिवस जीवशेकटशे (जिवश्च कंठश्च) स्नेह चालविला त्याचे सार्थकाचा समये हाच आहे. यास्तव या फाशातून यासमई मला मुक्त केल्यास नेहेत्याची कीर्ति राहील व आब्रु ही राखिलीसे होईल. सबब लिहिले आहे तरी बोलल्या प्रो वचेने सिध्धीस न्यावे.
३. आपले श्नेही माघ वा। १४ रोजी शुक्रवारी सातारा मुकामी दाखल जाले म्हणौन ऐकण्यातही आहे व त्याचा निरोपही भेटीस येणे म्हणोन मला अला होता. परंतु मी या अडचणीत गुंतलो याजमुळे भेटीस जाण्याचा योग घडला नाही. शहरात असतो तरी कोणत्याही प्रकारे गेलो असतो. दूर पडलो याजमुळे नाइलाज आहे. तरी दोस्ताची व माझी भेट करणे आपले स्वाधीन, जागोन लिहिले आहे.
चाकरी सोडून ज्या मित्राकरिता घरी राहिलो त्या मित्राचीही भेट नाही व चाकरीही नाही, असेही असोन फेऱ्यात पडलो असा अर्थ जाला आहे. तरी याचा खेद जो होत असेल तो उभयेता तुमचे आमचे लक्षांत आहेच. ल्याहावेसे नाही. सारांष या संकटातून निघोन त्याची व आमची भेट व्हावी असा मानस आहे. तो शेवटास नेणार आपण जाणोन विनति लि।। आहे.
येकुण तीन कलमे लिहिली आहेत यात सारांष मात्र लिहिला आहे. तपशीलवार मजकुर मशारनिल्हे सांगता कलेल. या मजकुरात आपला तोटा होतो असे नाही. परस्परे कार्य होऊन आपला उपकार राहून नेही मुक्त होतो असे आहे. तरी तूर्त यासमई आपण कार्य करून यश घ्यावे आणि येथे येणे जाले म्हणजे ज्या ग्रहस्ताकडून आमचे कार्य करून देविणार होता त्याजपासून आपणच घ्यावे. बहुत अर्थ आहे असा नाही.
३०० तीनशे च्यारसे आपण प्रभू क्षत्रीय कोणते जागी मिलवालच असी उमेद करून मला मुक्त करावे. बहुत लिहिले तरी अडचणीत आहे. लिहिण्याची चोरी. सवड नाही. त्यातच फुरुसद करून लिा आहे. तरी मारनिल्हे रिकामे न येईल असे जाले म्हणजे अडचण सोसून लिहिले आहे याचे सार्थक. कळावे, वरचेवर पत्रद्वारे संतोषवीत जावे. भेटीचा लाभ लौकरच द्यावा. नेही वाट पाहतच असतील. लोभात अंतर न करावा व कार्यास अनमान करू नये. मशारनिल्हेस विन्मुख पाठऊ नये हे विनति.
ता। १ मार्च सन १८३८
तुमचा मित्र सातारकर वा। पेठ शेनवार माची
२. मि।। फाल्गुन शु।। ९ शके १७५९ विनति विशेष. आपण गेल्या तागाईत काहीच मजकुर समजण्यात येत नवता तो हाली राजश्री सीतारामपंत आपणाकडून अले त्याणी सांगितल्याजवरून काल इकडील महार तरी आपण गेल्या नंतर आम्हा उभयेताचे हाल व खराबीत अलो तोही तपशीलवार काचा मजकुर मशारनिल्हेपाशी सांगितला आहे. हे सांगतील त्याजवरून लक्षांत अणोन आमचा गला मोकळा करावा.
या संकाटातून दूर केले तरच मित्रत्वाचे व आपले सांगितल्या प्रो कार्य केल्याचे सार्थक, हाली ता १ रोजी दोन ग्रहस्त मध्यस्त करून त्याचे मर्जीनुरुप वागोन तो बोलले त्याप्रो कबूल करून तुर्त काही शहरांत येण्या जोगी मोकलिक करून घेतली आहे. त्या मध्येस्ताची तोड जोड केली तो मजकुरही मशारनिलोस सांगितला आहे ते सांगतील. आपणाकडे हा मजकुर कळावा म्हणोन शुा ६ चे रोजी मुदाम मनुष सा केला आहे.
त्यास येथेभुत माहीत आहे. भेटी जाली असल्यास त्याणीही सांगितला असेल कलावे. सारांष मी पेचातून पार पडेन व घरांतील वडिलाचा टपका मजवर न येता लौकर उलगडा होईल ते करावे. वा। १ पावेतो आपले प्रत्युतराची वाट पाहीन, नंतर शेवटचा विच्यार सुबेल तो करीन, बहुत काय लिहू, आपणास सर्व माहित आहेच. मी ल्याहावे असे नाही व अटक यास्तव लाच्यार म्हणोनच अनमान लोभाची वृध्धी निरंतर असावी व कार्य जितके लौकर होईल हर कसेही करून करावे हे विनति.
मि।। फाल्गुन शुा। ९
रविवार शके १७५९
सही तुमचा मित्र सातारात राहणार
शेनवार पेठकर
१९. बापुजी अनंदराव याणी लेहून दिल्हे त्यांतील मजकुर
१. ता ३ नवंबर सन १८३८ हसील मजकुर हैबतराव व विश्वनाथराव व मी व अपा सिंदकर याणी पत्रे लिहिली. परंतु ती चौकशी हाली होत आहे. सबब मी सरकारात प्रा करण्यास श्रीमंत राजश्री बालासाहेब राजे सेनापति याजपासी प्रा केली.
सही बापुजी अनंदराव
२. ता. ३ नवंबर १८३८ चे लिहिण्यात की फितुरी अठ पत्रे माझे गुजारतीनें तयार जाहाली, ती मी य हैबतराय सीकारखाने व अपा सिंदकर असी तिघानी लिहिली ती नाव निसीवार
१ बाजीराव प्रधान पेशवे यांचे नावे
१ समस्त सावकार लोक याचे नावे
१ हैबतराव सीकारखाने याचे नावे
१ आत्माराम लक्ष्मण उर्फ अपा सिंदकर याचे नावे
१ समस्त सीपाईलोक पलटणीचे सुधा
२ विस्वनाथ रंगराव याचे नावे
१ बापुजी अनंदराव भी खुद माझे नाव
येणेप्रमाणे लेहून त्याज पैकी माझे नावचे अपा सिंदकर याचे हतचे व बाजीराव प्रधान याचे नावाचे हैबतराव यांचे हातचे असी दोन पत्र मजवल होती. ती जी पत्रे लिए ती विस्वनाथराव
व
हैबतराव याचे नावे सांगितल्यावरून लिए व मसुदे हैबतराव याणे केले आणि मी व हैबतराव व अपा सिंदकर ऐसी तिघानी लिहिली. मसुद्याचे पुढके जव्हाहीर खान्याचे रुमालात आहे. परिरछफुटीत अणु नये. तुम्हास खोटे वाटत असल्यास आम्ही आपले हातचे पत्रे लिए आहेत ती तुम्हास देतो याप्रमाणें विस्वनाथ व हैबतराव याणे सांगून पत्रे आपले जवल घेतली व सीके केले म्हणोन सांगितले आणि दोन पत्रे सीके करून माझे हवाली केली, हा मजकुर सरकार चौकशी करीत आहे सबब सरकारात प्रविष्ठ करण्यास श्रीमत राजश्री बालासाहेब शेनापती याजपासी दिल्ही आहे.
बापुजी अनंदराव सही खुद
३. ता ५ नवंबर सन १८३८ जी पत्रे फितुरी केली ती वर तपशीलवार लिहिली आहेत. दुसरे कितीक केली असतील हे न कले. येक पुडक्यात लिहिलेली पत्रे व कोरे कागदावर सीके केलीले दौले सुमार २५ येक पुडके होते त्यात येक पत्र जानु भंडारी व अजीजखान याचे सरदारी फौज जमवायाची ऐसी दोन होती ती काय केली न कले.
सही बापुजी अनंदराव खुद
४. ता ६ नवंबर सन १८३८ चे हसील जानु भंडारी याणे जामदार खान्यातोन सीका काढून देऊन हैबतराव व विस्वनाथ याही सीके पत्रावर केले. त्यावेलेस रात्र होती. त्यास दोन वर्षे जाहाली त्रिवर्गानी खोलीत बसोन सीके केले. मी बाहेरचे खोलीत बसोन होतो. तेथे येऊन मजला सांगितले की सीके आणि पत्रे रुमालात बांधोन ठेविली. हे सर्व कृत्ये करण्यास पुरस्कर्ते हैबतराव बलवंत व रुकार खोटे काम असता सारे बोलण्यास विस्वनाथराव
बापुजी अनंदराव सही खुद
२०. हैबतराव बलवंत सीकारखाने याणी जानलिंग दिन गणलिंग गुरव वा माहीम नजिक मुंबई यांचे घरी खोटे कागद ठेविले ते चौकशी करिता गुरव याणे दिल्हे ते त्यात हसिल.
१. मि।। कार्तिक या ११ त १२ नवंबर सन १८३८ नाना गुरव यास हैबतराव याणी पत्र लिहून दिल्हे की तुमचे घर भाड्याचे व उसीनवार येकदर रुपये देणे त्यास महाराज सरकार प्रकर्णी कागद पत्र वगैरे आहेत, तुम्हाजवल ठेविले आहेत, त्यास तुमचे रुपये देऊन कागद घेऊन हिसेब लक्ष्मण याचे विद्यमाने होईल त्या प्रो देऊ म्हणोन पत्र.
सही हैबतराव बलवंतराव सीकारखाने
२. ता ३० दिजेबर सन १८३८ जानलिंग बिन गणालिंग गुरव लिंगाईत मु।। माहीम मुंबई याणे छ्यापील कागद अर्ध रुपयाचा घेऊन पावती लिए त्यातील मजकुर कारणे पावती लिहून दिल्ही ऐसीजे. हैबतराव व बलवंतराव सीकारखाने याणे मजपासी सीक्याचे कागद येक पत्र लिहिलेले सीका मोर्तबासुधा व दोन कोरे कागदावर सीके व मोर्तबा केलेले एकुण तीन कागद व त्याचे किरकोल कागदाचा रुमाल लहान येक येणे प्रो माझे हवाली करून मजला चिठी लिहून दिल्ही ते रुपये येशवंतराव राजे शिर्के भगवतराव विठल माहीम मुकामी लक्षुमण ब्राम्हण निए हैबतराव याचे रुजवातीने रुपये १६३॥ दिल्हे ते मी भरून पावलो. हैबतराव याणी कागद सीक्याचे खोटे क्रीतीचे सदरहू तीन व खेरीज एक रूमाल कागदाचा लाहन कइ (?) व चीजवस्त दिल्ही. या खेरीज कागद व चीजवस्त मजकडे राहिली नाही. मी सर्व दामदाम भरून पावलो ही पावती आपले अकल हुशारीने लिहून दिल्ही.
सही जानलिंग बिन गनलिंग
हस्ताक्षेर गोविद लक्ष्मण थते
मु।। माहिम
साक्षे
१ गणेश आबाजी दातार वा।। मुंबई
१ भिकाजी कृष्ण गोडबोले मु।। माहिम
१ वामनाजी रामचंद्र गद्रे हस्ताक्षर खुद मु।। मुंबई
३. खोटे पत्र सीक्या मोर्तबासह मि।। कार्तिक शु १३ राज्याभिषेक शके २६३ दुमुखीनाम सवत्सरे श्री राजा प्रतापसिंह छत्रपती स्वामी याणी राजमान्य राजेश्री हैबतराव बलवत तोफखाने यासी अज्ञा केली जे इंग्लेश लोक हे समुद्राचे बेटातील राहाणार याणी प्रिथीवीवर येऊन बहुतेकाचे कर्तुत्वाचा उपमर्द करून कोणात शौर्य कर्तुत्व राहिले नाहिसे केले.
सर्वत्राचे दौलतीचे आपहार केले, ते पुन्हा उदये पावले नाही. असे तजविजीनी सर्व लोक हातवीर्य केले. राहिले ते पुढे करणार. याचा आदेशा मनात आणोन जंग करावा हा इरादा ठेवावयाविसी तुम्हास आज्ञा होत आहे. जे आपले द्वीपावरील बळ येकवट करून शर्त करून पराक्रमाने शत्रु जेर करावा आणि आपले लोक स्वधर्मे करून वागऊन सुखी करावे व तुम्ही पुरातन पुरे इतबारी जाणोन तुम्हास उपयोग येतील त्यास तुम्ही करार करून द्याल ते उजुर करार असे जाणिजे छ ११ साबान बहुत काय लिहिणे मोर्तब
४ कोरे कागदावर सीके व मोर्तब केलेले कागद २ दोन त्यास लिहिले नाही. पुढे मनात येईल तो मार ल्याहावा असे मतलबास घेतलेले ते
५. अत्माराम लक्ष्मण देशपांडे ता हिरडस मावल हस्ता अक्षेर खुद सदरहु कागद कोरा. त्याजवर सही करून घेतलेली. त्याजवर मतलब काय लिहिणे असेल तो ज्याचा तो जाणें.
२१ ता। १८ मार्च सन १८३६ इसवी चैत्र शु।। १ बालाजी कासी किबे यासी माहराज सरकारचे बोलणे होऊन तो मजकूर करनेल रसीदंट साहेबास कलऊन रसीदंटानी उतरे केली ती किबे याणी लिहून पाठविली यातील हसील मजकुर.
१. सरहादी प्रो पेशजी सरकारचे लिहिणे आले ते कौसलात लिहिलेच आहे. तेथील कोर्ट डरेकटर यास लिहिले गेलेच असेल. गौरनर साहेबाची स्वारी नहरास अली तरी विलायतचे लिहिणे गेले किंवा नाही इतकेच मात्र पुसावे. सारांष विलायतेहून त्या प्रकर्णी जाब येई तोपयत कोणताही उपक्रम करून उपयोग नाही. गौरनर जनरल साहेब याचे मुलाकतीविसी पुसावे असे नजरेस येत नाही.
२. हरकत कर्ता येती निवारणा करिता कोर्टाचा वगैरे हुकुम पाहिजे म्हणोन कोणतेही होते ते कोर्टाचे हुकुमाचे धोरणा सीवाय गौरनर साहेब वगैरे कोणीही कामदार करीत नाहीत.
३. बडोदकराचा दाखला त्यास लौकिकात मात्र दिसते की मालक साहेब बहादुर याणी हरकत केली, ती कलकत्यास वकील पाठविल्यामुळे मोकळीक जाली. म्हणोन त्यास असे नसेल असे असेल की गाईकवाड याचा शाहाणपणा अधिक आहे. परंतु किचित आग्रही स्वभाव यामुले काही जुनी व काही नवी मंडळी पोटार्थी कोते आदेशेवाले याणी अनुमोदन कुतर्कास पुरू देत गेल्यामुळे, मैलाची गाठ उलगडावी ती बसत चालली. ते तेथील रसीदंटाचे मनास येईना. ते रसीदंट साफ चालीने चालणारे. सयाजीराव याचे मनात मैल वाडला त्यास ज्या पदार्थास मैल लागतोतो काडावया करिता दुसरे प्रकाराचा मैल अधिक लावावा तेव्हा तो मैल निघतो असे आहे व कोर्टातोन हुकुम येण्यास व गाईकवाड याणी कलकत्यास वकील पाठविण्यास संधी मिळाली म्हणोन लोकास मात्र दिसते. परंतु कोर्टाचे धोरणांशीवाय काही होत नसते.
४. जाहागीरदारांचे मोबदल्याचे प्रकर्ण तरी तुर्तकाली त्या वाचुन उभये सरकारची नुकसानी व नफा हेही काही नाही. यास्तव कोर्टाचे उत्तर येई तो पर्यंत कोणतेही बोलू नये असे वाटते.
५. गौरनर जनरल लार्ड साहेबाचे मुलाकतीचा मजकुर तरी लार्ड उलीयम बेंटिक साहेब बहादूर हे फार वर्षाचे या मुलखाचे वाकबगार होते सा। त्यास सर्वाचे मुलाखतीची हौस होती. हालीचे येणार ते या मुलकात कधी अलेले नाहीत व पेशजी बैंटिक साहेब याच्या भेटीस गेले ते कलम त्याचे गौरनरी खाली होते तेच गेले. परंतु मुंबई ताब्यातील कोणी गेले नव्हते, ते मदरासेस अले तेव्हा मात्र त्या ताब्यातील मोठे लोक त्यास भेटले. तसेच मुंबई ताब्यात अले असते तरी महराज सरकारचीही मुलाखत जाली असती. त्यास हालीचे गौरनर जनराल साहेब कलकत्यास येणार, ते ज्या काली मुंबई इलाख्यात यावयाविसी त्याची खुसी होईल तर ते अगोदर समजेल. त्याकाली मुलाखतीचा उपयोग केला तर करावा. परंतु तुर्त या कामाकरिता कोणी कलकत्यास पाठवावा की काय ही सला गौरनर साहेब याजपासी काढावी असे नजरेस येत नाही.
६. पुढील पिढीच्या वहिवाट करणरास काही संषये राहू नये म्हणोन त्यास कोर्टाचे लिहिणे येणार, ते अल्यानंतर काय विचार कर्णे तो करावयास ठीक परंतु आगोदर कोणताही उपयोग नाही. राज्यकारभार आहे तेथे किती निःसंपय करीन म्हटले तरी होणे मुषकल संपये हमेशा येतात व येतील व निवारणही होतात व होत जातील त्याचा येव्हाच विच्यार करावयाची गरज दिसत नाही.
७. विलायेत व कलकता वकील सरहादी प्रकर्णी पाठवावयाचा मजकुर तूर्त कायम मनात अणावा असे वाटत नाही. कोर्टाचा जाब येईल त्यानंतर त्याचा विच्यार कदाचित जाब न आल्यास आमचे जाणे विलायतीस होईल. त्या काली कोर्टात माहराजाचा मजकुर पुरा समजला नसलियास समजाऊन यावयासी येईल. परंतु तुर्त काही करू नये असे वाटते.
८. दीड वर्षानी नाशकास जाणे ते लाट साहेब याचे भेटीस जाता येईल. म्हणौन त्यास कोर्टाचा जाब येईतोपर्यंत काही विच्यार करू नये असे वाटते. साहेब बोलले की स्वारी नासिकास गेल्यास आमचे ही मानस स्वारी बरोबर नाशकास येण्याचे आहे.
९. बडोदेकराचा दाखला त्यांस माहराज सरकारची दोस्ती जशी इंग्रेजी सरकारची आहे. तसी बडोदे वगैरे सरकार वगैरे आहेत त्यासी दोस्ती इतकी नसेल, असे दिसते. यास्तव त्याचा दाखला या सरकारात घ्यावा असे वाटत नाही.
असा मजकुर आहे. इतक्यातील सारांष करनेल लाडविक साहेबाच्या बोलण्यात की कोर्ट डरेकटर याचे लिहिणे येईतो परयेत काही येक तजवीज माहराज सरकारातोन मनात अणावी असे नाही म्हणौन पत्र
सही बालाजी कासी किबे दस्तुर खुद
(१०) नातू कटांतल्या लोकांची माहिती
बाळाजीपंत नातूने प्रतापसिंह छत्रपतीवर ज्या अनेक कारस्थानांची कुलंगडी उपस्थित केली. त्यांची रूपरेषा व त्यांत सामील झालेल्या ब्राम्हण ब्राम्हणेतर पात्रांची नांवे येथे देतो. कारस्थाने म्हटली म्हणजे त्यांच्या शाखा, उपशाखा, भेद, पोटभेद, पोटपोटभेद थेट हिंदु समाजांतील जातीभेदांप्रमाणे अगणितच असायचे. त्या प्रत्येकाची माहिती व वर्णन देता येणे शक्य नाही. म्हणून त्यातले मुख्य भेदच सांगतो. हे मुख्य भेद तीन होते :
(अ) इंग्रजाना महाराष्टातून हाकून लावण्यासाठी छत्रपतीनी गोव्याच्या पोर्च्युगीज गव्हर्नराशी गुप्त कारस्थान बरीच वर्षे चालविले. (गोवा कट.)
(ब) याच उद्देशाने नागपूरच्या पदच्युत भोसल्याशी गुप्त खटपटी केल्या. (जोधपूर कट.)
(क) इंग्रजांच्या फलटणीत नोकरी असलेल्या हिंदी शिपायाना फितूर करण्याची गुप्त कारस्थाने केली. या तीन कटांची छत्रपतीवर शाबिती करण्यासाठी नातूने जी अनेक ब्राम्हण ब्राम्हणेतर वेताळोपवेताळाची सेना आपल्या परशुरामी छत्राखाली जमवून चित्पावनी लोकसंग्रहाची पुण्याई कमाविली. त्यांची जातवार नांवनिशी खाली देतो:
(अ) गोवा कटांतील ब्राम्हण देशभक्त
१. वासुदेव शास्त्री
२. दाजीबा वैद्य
३. बाळकोबा तात्या केळकर (प्रमुख)
४. मोरोपंत जोशी
५. हरीपंत फाटक
६. नारायण भट चितळे
७. रावजी कोटनीस
८. खंडो व्यंकटेश
९. काशी बाजीराव
१०. गोपाळ जयराम कोलटकर
११. आबाजी नारायण जोशी
१२. मोरोपंत पटवर्धन
१३. निळो आबाजी भडकमकर
१४. संजीवन ब्राह्मण
१५. पुरुषोत्तम अनंत गोसावी
१६. बाळाजीपंत नातू (उत्पादक)
१७. काशी शिवराम बोंद्रे
१८. रामचंद्र गंगाधर
१९. दाजीबा जोशी दप्तरदार
२०. राजारामभट मुंडले
२१. गोविंदराव मुंडले
२२. विष्णुपंत फणशीकर
२३. नारायण भट सिधये
२४. शिवरामभट लाडकर
२५. बाळाजीपंत जोगळेकर
२६. हरभट बिन रामचंद्रभट हळवे
२७. धोंडो विष्णु आपटे (सावंतवाडीचे छत्रपतितर्फेचे तोतये वकील)
२९. नागो देवराव (सूत्रचालक)
गोवा कटांतील नागो देवरावच्या हाताखालचे ब्राम्हणेतर हरामखोरांचे पथक
१. आवजी बिन हिराजी
२. सखोजी बिन लिंबाजी
३. वेंकप्पा बिन पिलाजी
४. हैबत बिन ज्योत्याजी
५. पटटुबिन सुलतानजी
६. खंडोजी बिन तुकोजी
एकूण २९ ब्राम्हण आणि ६ ब्राम्हणेतर
(ब) जोधपूर गटातील ‘ब्राम्हण देशभक्त’
१. कृष्णाजी चिंतामण आगाशे
२. बाबाजी महिपती
३. पुरुषोत्तम अनंत
४. काशीपंत बोंद्रे (एकापेक्षा अधिक कटात सामील)
जोधपूर कटांतील ब्राम्हणेतर पात्रे
१. एळोजी मोहिते (एकापेक्षा अधिक कटात सामील)
२. आप्पाजी जाधव
३. विठू बोगणा
४. विठू पट्टेकर
५. केदारी मन्या
६. धोंडी तात्या
७. आबा महाडिक (एकापेक्षा अधिक कटात सामील)
८. आबा पारसनीस (प्रभू) (एकापेक्षा अधिक कटात सामील)
९. दिनकरराव मोहिते
१०. एकूण ४ ब्राम्हण आणि ९ ब्राम्हणेतर
(क) शिपायी फितुराच्या कटांतील ‘ब्राम्हण शिष्ठ’
१. सुभेदार गुलजार मिश्र
२. परशुराम गांधी
३. काशीपंत बोंद्रे (एकापेक्षा अधिक कटात सामील)
४. अंताजी वाघ
ब्राम्हणेतर पात्रे
१. सुभेदार शिवगुलामसिंग
२. हवलदार चंदरसिंग
३. काश्या मालू
४. आबा महाडीक (एकापेक्षा अधिक कटात सामील)
५. आबा पारसनीस (प्रभू) (एकापेक्षा अधिक कटात सामील)
६. एळोजी मोहिते (एकापेक्षा अधिक कटात सामील)
७. आबा मोहिते
एकूण ४ ब्राम्हण व ७ ब्राम्हणेतर
या कटवाल्यांची जातवार वर्गवारी अशी
अ. गोवा कारस्थान : २९ (ब्राम्हण) / ६ (ब्राम्हणेतर)
ब. जोधपूर भोसले कारस्थान : ४ (ब्राम्हण) / ९ (ब्राम्हणेतर)
क. शिपायी फितुराचे कारस्थान : ४ (ब्राम्हण) / ७ (ब्राम्हणेतर)
एकूण : ३७ (ब्राम्हण) / २२ (ब्राम्हणेतर)
या शिवाय आणखी बरेच छोटे मोठे सज्जन छत्रपती विरूद्ध उभारलेल्या नातू संप्रदायांत सामील होते, त्यांची नांवे या प्रकरणाच्या कागदपत्रात मधून मधून आढळतात. विशेषतः आपा शिंदकर हे एक कायस्थ पात्र या यादीत जरी चमकले नाही, तरी छत्रपतीच्या पदभ्रष्टतेच्या कार्यात या पात्राने एखादा चित्पावनाला शोभेशी कामगिरी करून, विप्रोत्तम बाळाजी नातूंचे वेदोक्त बक्षिसांचे आशीर्वाद मिळविले, हे नमूद करायला हे कायस्थी कलम निस्पृहतेला पराङमुख होणार नाही. त्याचप्रमाणे मला राहून राहून आश्चर्य वाटते ते हेच कीं ज्या वेदशास्त्रसंपन्न प्रभूने आबा पारसनीसाने- वेदोक्त प्रकरणाच्या भयंकर ग्रामण्य युद्धात छत्रपति प्रतापसिंह महाराजाच्या वतीने, काशी ते रामेश्वरपर्यंतच्या मोठमोठ्या पंडिताग्रणींशी वाग्युद्धाचा सामना देऊन क्षत्रियांचे क्षात्रतेज व वेदाधिकाराचा सनातन हक्क सिद्ध केला. आपल्या ‘सिद्धांत विजय’ नामक संस्कृत ग्रंथापुढे त्या पंडिताग्रणीना ‘धन्य धन्य` म्हणून माना डोलवायला लावले आणि प्राचीन ग्रंथाधारे स्वतः रचलेल्या वेदोक्त राजाभिषेकविधी प्रमाणे, आपल्या स्वतःच्या देखरेखीखाली छत्रपति प्रतापसिंहाला राजाभिषेक करविला, तोच गृहस्थ अखेर छत्रपतीच्या विरुद्ध उठलेल्या नातूशाही वावटळीत सामील व्हावा, ही गोष्ट सकृदर्शनी अविश्वसनीय वाटेल, पण ती खरी आहे. एवढे मात्र खरे की आबा पारसनीसाने आप्पा शिंदकराइतका राष्ट्रीय चित्पावनपणा मुळीच केलेला दिसत नाही किंवा खुद्द छत्रपतींचाही त्याच्याविरूद्ध फारसा आक्षेप दिसत नाही. ग्रँट डफने त्याला ‘गैरवर्तना’मुळे बडतर्फ केले, एवढाच आक्षेप त्यावर होता व त्यामुळे छत्रपतीची त्यावर ‘गैरमर्जी’ झालेली दिसते. याबद्दल खुद्द छत्रपतीचे व मुंबई गव्हर्नर सर जेम्स कारनाक यांचे झालेले संभाषण पाहा :
छत्र - आबा पारसनीसाला कॅप्टन गँटने गैरवर्तणकीवरून बडतर्फ केला. त्याला मी क्षमा करणार नाही.
सरकारनाक - पण एक वेळ पारसनीस तर तुमच्या नाकचा बाल होता.
छत्र - होता पण इंग्रजांची त्याच्यावर झालेली गैरमर्जी सुधारण्यासाठी तो माझ्याविरूद्ध गुप्तकटांत सामील झाला. असल्या लोकांना क्षमा किंवा त्याना काही तनखा (अलौन्स) देणे माझ्याच्याने साफ होणार नाही. इंग्रेज सरकारांनी त्याची मन चाहील तशी बडदास्त ठेवावी.
सर कारनाक - हा मनुष्य इतका जर वाईट होता तर राजेसाहेबानी त्याला आपल्या नोकरीत कशाला ठेवला होता?
छत्र - गुप्त कारस्थानांत सामील होण्यासाठी काही मी त्याला पोसला नव्हता!
सारांश, आबा पारसनीस व छत्रपति प्रतापसिंह यांचे कोठे तरी बिनसले होते. पण एकंदर सातारा प्रकरणाच्या भानगडींत नातूकंपूला जाऊन मिळण्यापलीकडे त्याची फारशी हालचाल कोठेच दिसत नाही.
परिशिष्ट ११) गोवाकटाचे खोटे शिक्के -
गोवा कटातल्या तहनाम्यावर नि सातारी पत्रांवर उठविलेला बनावट शिक्का. नागो देवराव नि बाळकोबा केळकरने हा पेडणे येथील सखाराम कामताकडून कोरून घेतला. यात नांवर आहे, शिवाजीचे. पण हा प्रतापसिंहाचाच दरबारी शिक्का, अशी नातू कंपूने थाप मारून, कंपनीच्या अधिकाऱ्यांना ‘बनवले’. रसिदंट ओवान्सने या ‘अस्सल प्रतापसिंही’ शिक्क्याबद्दल केळकरला रोख ४०० दिले.
धारवाडचा सुभा मि. डनलॉप याने झडत्या घेऊन केळकर, जोशी, कामत वगैरे पुंडांच्या साक्षींत अनेक बनावट कागदांवर उठविलेले हे शिक्के उजेडात आणले. ‘हा प्रतापसिंहाचा शिक्का’ असे पुंडांचे म्हणणे होते.
(मूळ शिक्क्यांचा व्यास (मोठे) २ इंच ४ सूत नि (लहान) १ इंच ४ सूत)
प्रतापसिंहाचा खरा दरबारी शिक्का
प्रतापसिंहाच्या हस्ताक्षराची अस्सल मखलाशी
आद्य छत्रपति शिवाजीचा खरा शिक्का
सरकार दरबारी कागदांवरील रंगो बापूजीची सही
(१२) चतुरसिंग भोसले यांचे त्रोटक चरित्र
साताऱ्याचा विशेष
मऱ्हाठी स्वराज्याची स्थापना जरी रायगडावर कुलाबा जिल्ह्यातील महाड तालुक्यांत झाली, तरी त्या स्वराज्याचा खरा तेखदार खेळ झाला सातारा शहरांत नि सातारा जिल्ह्यांत. संभाजीच्या वधानें जवळ जवळ ठार झालेलें मऱ्हाठ्यांचे हिंदवी स्वराज्य, जिंजीचा प्राणांतिक वनवास भोगून, साताऱ्याच्या मैदानावर पुनरुज्जीवित झालें. तेथेंच त्याचा भारतव्यापी विशाळ नि प्रचंड साम्राज्य-वटवृक्ष फोफावला.
इतका कीं त्याच्या सांवटाखाली दिल्लीची जहांबाज मोगल बादशाही पार काळवंडून गेली. पण अखेर त्याच साताऱ्याच्या भूमीवर तें मऱ्हाठी साम्राज्य घरच्या नि दारच्या कटबाजांच्या कारस्थानांना बळी पडले. शिवरायाच्या हिंदवी स्वराज्याचा अथवा राजाराम छत्रपतीच्या ‘मराष्ट्र’ राज्याचा साताऱ्याच्या भूमीवर खूप पडला. मऱ्हाठ्यांच्या राजकारणी दराऱ्याची साताऱ्याच्या मातींत माती झाली.
तरीहि त्याच मातींतून हिंदवी स्वराज्याच्या पुनर्घठनेच्या डरकाळ्या फोडीत अनेक क्रांतिवीर पूर्वी निघाले, आज निघत आहेत आणि पुढेहि निघतील. मऱ्हाठी स्वराज्याची पुनर्घटना हा सातारी वातावरणांतला एक जीवनविशेष आहे.
छत्रपतीच्या तक्ताखालीं सर्वनाशाचे सुरुंग कडाकड उफाळत असताना आणि चहूंबाजूंना कटबाजांचा बाजार मातला असतांना छत्रपतीच्या नांवासाठी, अब्रूसाठी, मऱ्हाठदेशाच्या राजकारणी इभ्रतीसाठी, सर्वस्वावर तुळशीपत्रे ठेवून निर्वाणीचा थैमान घालण्यासाठीं मागें जे अनेक बामणेतर वीर सरसावले, त्यांत चतुरसिंग भोसले आणि रंगो बापूजी ही नावें इतिहासात अजरामर झाली आहेत.
चतुरंग भोसले
छत्रपति रामराजाला दत्तक दिलेला विठोजी ऊर्फ धाकटा शाहू आणि चतुरसिंग भोसले हे दोघे सख्खे भाऊ. सुप्रसिद्ध भोसले बंधू मालोजी नि विठोजी पैकी हे दोघे विठोजीचे वंशज. दत्तविधान झालें तेंव्हा भावाच्या बरोबर चतुरसिंग साताऱ्यासच राहू लागला. धाकटा शाहू अगदींच ढ नव्हता. शरीरानें तो चांगला दणधाकट होता. पण स्वतंत्र बुद्धि चमकायला जे मोकळे वातावरण लागतें तें त्याला कधीच लाभू नये, अशा नजरकैदेच्या जीवनांत पेशव्यानीं त्याला सातारच्या किल्ल्यावर अटकेंत ठेवले होते. सवाई माधवरावाच्या मृत्यूपर्यंत पुण्याला राज्यकारभार ठाकठीक चालला होता. तोंवर, कशाला आपण त्यांत ढवळाढवळ करावी, अशा हेतूनें शाहू स्वस्थ होता. रावबाजी पेशवे बनल्यावर, नाना फडणीसाने छत्रपतींचा चारी बाजूंनी कोंडमारा केला. छत्रपतींना सारा वसूल करता येईना. खर्चाची नक्त रकम पुण्याहून येऊ लागली. पागा हत्ती सारें पुण्याला आणून ठेवले. छत्रपतींच्या निवासस्थानावर चौक्यापहारे बसले. राजमंडळाला नि इतर कोणालाहि छत्रपतींच्या भेटीची बंदी झाली. किल्ल्यावरील झाडांना आंबे आले तरी, ते पुण्याहून लेखी हुकूम आल्याशिवाय छत्रपतींना किंवा त्यांच्या मुलांना तोडून खाता येत नसत. सारांश, सध्या आंग्रेजी अमदानीत राजबंधाना जेवढ्या सरकारी सवलती मिळतात. तेवढ्याहि नोकर पेशव्यांनी छत्रपति मालकाला दिल्या नाहीत.
चतुरसिंग भडकला
नाना फडणिशी कारभाराने स्वतःचें नि परिवाराचें जिणें गुलामापेक्षांहि नीच नि उघड अमर्यादेचे झालेले पाहून शाहूचे डोळे उघडले. यापूर्वी चतुरसिंगानें त्याला शुद्धीवर आणण्याचे अनेक प्रयत्न केले होते. पण ते त्यानें जुमानले नाहीत. आतां मात्र तो पेशवाई जुलामाविरुद्ध धुसफुसूं लागला. पण करतो काय? अडकली गाय, फटके खाय! राज्याचें पुढे काय होणार, या विवंचनेनें शाहू तडफडू लागला. चतुरसिंग तर काय नुसता रुद्राचा अवतार बनला!
"तक्ताचे मालक छत्रपति, पण या पेशवे भटानी सारा कारभार पुण्याला आटोपून आम्हा बामणेतर मराठ्यांना नि छत्रपतींच्या राजमंडळाला पाण्यापेक्षां पातळ करून टाकलें. आतां तर लेकाचे आंग्रेजांच्या पंजांत अडकले. खुशाल देतील उद्यां राज्याचा वारसा त्या चोराना लिहून, यांच्या बापाचे काय तीन चव्वल खरचतात! राज्य कमावणारांचे दंडधारी वंशज बसले हात चोळीत आणि ही पुण्याची भटें खुशाल करतात स्वराज्याची हवी तशी तसनस बस्स झाला हा कोंडमारा? मेलेल्या मुडद्याप्रमाणें चालू प्रकार पहात स्वस्थ आतां किती बसायचें?" अशा गर्जना चतुरसिंग करू लागला.
सातारच्या मराठ्यांच्या स्वभावाची एक खोंच आहे. हवी ती जाचणूक ते बराच वेळ नेभळ्यासारखी सहन करतील. हात नाही हालवायचे. पण एकदा का पठ्ठ्या भडकला की कुऱ्हाड उचलून खून करायला देखिल मागेंपुढें नाही पहायचा!
मराठ मंडळ खडवडलें
रावबाजीच्या अमलांत पुण्यास माजलेली बजबजपुरी गि बेबंदशाही हीच पेशव्याविरुद्ध उठाव करायची छान संधि आहे, अशा बिनचूक धोरणानें चतुरसिंगानें राजमंडळाला हालवले आणि छत्रपतिनिष्ठ तरुणांची संघटना केली. पेशव्याला ठेचून, त्याच्या नबळाईने महाराष्ट्राला झोंबू लागलेल्या आंग्लाई इंगळ्याचाहि खातमा उडवायला चतुरसिंग कंबर कसून सजलेला पाहून, शाहूला मोठा धीर आला. चतुरसिंग जात्याच हुशार, धाडशी कल्पक नि मानी पिळाचा मराठा असल्यामुळें, हां हां म्हणतां अनेक मराठे, देशस्थ ब्राम्हण नि कायस्थ प्रभू तरुण मुत्सद्दी नि लढवय्ये चतुरसिंगाभोंवती जमा झाले. व्यासराव गोपाळ डबीर, बापू कान्हो फडणीस, मल्हार रामराव चिटणीस (आद्य बखरकार), मुंगीकार मालोजी राजे, भवानजी राजे शिर्के, रघुनाथराव गुजर वगैरे अनेक जवानमर्द मंडळी चतुरसिंगाच्या मदतीसाठी घरादाराचा निरोप घेऊन बाहेर पडली. शाहूनें त्यांना आशीर्वाद दिले.
थुत् तुझ्या सरदारीवर।
ठिकठिकाणच्या छोट्या मोठ्या किल्लेदारांचा नि वतनदारांचा पाठिंबा मिळवीत चतुरसिंग हजार बाराशें सैन्य घेऊन भडकूं लागल्याची बातमी सर्जेराव घाटग्यानें बाजीरावाला दिली. बामन गडबडला! नाना फडणीस तर सर्दच पडला! आधींच बाजीराव अंग्रेजांच्या पंजांत उंदरासारखा सांपडला होता. तशांत हा घरचा जोरदार पेंच पाहतांच त्याची धांदल उडाली.
"काहीही करून चतुरसिंगाला माझ्या भेटीला घेऊन या म्हणजे मी आणि दौलतराव शिंदे त्याची समजूत काढू", असें सांगून बाजीरावानें घाटग्याला चतुरसिंगाकडे रवाना केलें.
"श्रीमंत तुला सरदारी देऊन तुझा वाजवी बंदोबस्त करायला तयार आहेत. तूं त्यांच्या भेटीला चल." अशी घाटग्यानें खूप गळ घातली.
"लेका, मी काय त्या तुझ्या श्रीमंताच्या सरदारीवर सुजलों आहे होय? आणि तो पेशवा भट रे कोण मला सरदारी देणार? मालकाला नागवून भिकारी करणारा हा कोण रे चोर मला सरदारीचें दान करणार?" असें चतुरसिंगानें घाटग्याला सज्जर खडसावलें. हो ना करतां अखेर निर्वाणीचा घाव घालण्यापूर्वी, बाजीरावाची नि दौलतराव शिंद्याची भेट घेण्यासाठीं सन १८०१ सालीं घाटग्यानें त्याला पुण्यास आणले. पावसाळ्याचे चार महिने चतुरसिंगाचा मुक्काम तेथेच होता. बाजीरावाच्या गुळचट थापेबाजीनें नि त्याच्या जाहीर छिनाल चारित्र्यानें चतुरसिंग कंटाळला. कालापहरण करून आपली संघटना मोडण्याची ही भटी कारवाई आहे. हे ओळखून एके दिवशीं तो पुणे सोडून बाहेर पडला.
वसईची `परमेश्वरी नोट`
पुढच्या वर्षी यशवंतराव होळकरानें पुण्यावर चाल करून राजधानीची जाळपोळ केली. बाजीराव वसईला पळून गेला आणि तेथे इंग्रजांना स्वराज्याची ‘परमेश्वरी नोट’ लिहून देऊन त्यांच्या पाठबळावर निलाजऱ्यासारखा परत पेशवाईवर दाखल झाला. वसईचा मुकाबला सगळीकडे जाहीर होतांच सातारच्या राजमंडळाची अवस्था लाचारीची झाली. चतुरसिंगाच्या आंगाचा अगदी तिळपापड उडाला. स्वराज्य कमावलें कोणी नि इंग्रजांना तें कब्जेगहाण लिहून देणार हे हरामखोर पेशवे कोण? उभा महाराष्ट्र तडफडला. पण कोणालाच काही इलाज सांपडे ना. एकदम एकादी जबरदस्त संघटनेची धडकी दिल्याशिवाय भवितव्य टळणार नाही, असा विचार करून शिंदे भोसले होळकरादि मंडळींना गठवण्याचा मनसुबा तरवून चतुरसिंग साताऱ्याला आला. पत्नि नि मुलगा शाहूच्या हवाली करून "सेवा करून यश मिळवून परत येऊ अगर मरून जाऊ’’ असे सांगून त्याने छत्रपतीचा निरोप घेतला.
कालचक्रच उलटें फिरलें
शिद्यांची छावणी बऱ्हाणपुरास होती. तिकडे जात असतांना वाटेत सिंदखेड येथे जिजामातेच्या वंशांतले प्रतिष्ठित सरदार जगदेवराव जाधव होते. त्यांची भेट घेऊन चतुरसिंगाने परिस्थितीचा खल केला. अजिंठ्याच्या घाटांत दौलतराव नि सर्जेराव यांची गांठ पडली. दि. १० ऑगस्ट १८०३ बुधवारी स्वतः दौलतराव चतुरसिंगाच्या डेऱ्यांत जाऊन भेटला. मोठा सन्मान केला. आदल्याच दिवशी मंगळवारी अंग्रेजांनी शिंद्याबरोबर युद्ध पुकारलें होतें. इंग्रेजांना सलामीचा हात दाखवायला ही संधि छान आहे, असा विचार करून, चतुरसिंगानें शिद्यांच्या बाजूनें आसई आडगावांच्या लढायांत मर्दुमकीची शर्थ केली. पण काळचक्रच उलटें चालललें!
शिद्यांचा पराभव झाला. युद्धाच्या इंग्रजी शिस्तीपुढे सगळ्या मराठा रथीमहारथींची दाणादाण उडाली. मऱ्हाठाशाहींतल्या यच्चयावत् मुत्सद्यांचे नि लढवय्यांचे या पराभवानें खडाड डोळे उघडले. सातारा करवीर प्रांतांतल्या छोट्यामोठ्या घरंदाज पुरुषांचे तर धाबेंच दणाणलें, हे पेशवे तर आपण बुडतातच आहेत आणि आपल्याबरोबर सगळ्या राज्याचीहि वाट लावताहेत! शिंदे होळकरांच्या पदरी मोठमोठ्या रोना असूनहि हे मूठभर गोरे भडाभड सगळ्यांना चारी मुंडे चीत मारताहेत! हे चालले आहे तरी काय? उभा महाराष्ट्र संतापाने वेडा झाला!
...तोडिला तरु फुटें आणखी भरानें
निराश न होतां, `घालीन पृथ्वी पालथी’ अशा उमेदीनें नि आवेशाने चतुरसिंग नागपूरला गेला. रघुजी भोसल्यानें त्याला दोन हजार फौज आणि दरमहा पंधरा हजार रुपयांची नेमणूक दिली. तेथून दौलतरावांच्या निमंत्रणावरून त्याला भेटावयाला तो सागरला गेला. यशवंतराव होळकराचीहि त्यानें गांठ घेऊन मसलत केली. पेंढाऱ्यांचे पुढारी अमीरखान करीमखान हेहि चंबळा नदीच्या कांठी त्याला येऊन मिळाले. सर्वांनी मनमोकळेपणानें संघटित प्रतिकाराच्या आणाशपथा घेतल्या. सर्जेराव घाटग्याला मात्र ‘‘छत्रपतींना पेशव्यांच्या जाचांतून सोडविण्याविषयी पूर्वी तुम्ही काय करार केले आणि पुढे त्याची काय वाट लावली?" असा खडा सवाल चतुरसिंगानें टाकून खजील केले. त्यानें माफी मागितली नि पुन्हां असे होणार नाही, अशी शपथ घेतली. सर्वजण अजमेरला गेले.
साहेब, याद राखून ठेवा!
इंग्रजांचा सेनापति लॉर्ड लेक त्या वेळी दिल्लीला होता. त्याच्याकडे चतुरसिंगानें आपला वकील पाठवला आणि भरतपूरच्या जाटाला आपल्या संघटनेत ओढून, तो स्वतः दिल्लीला जाऊन लेक आणि माल्कम याना भेटला. दोघांनीहि चतुरसिंगाचा सन्मान केला. "साहेब, पेशवे हे छत्रपतीचे नोकर. स्वराज्याचे मालक छत्रपति, आम्ही त्यांच्या स्वराज्यासाठी झगडत आहोंत. पेशव्यानें स्वराज्याविषयीं तुम्हाला काहीहि लिहून दिलें असलें तरी तें आम्ही मराठे बिलकूल जुमानणार नाही. याद राखून ठेवा!"
वगैरे पुष्कळ बोलणी झाली. लेक, माल्कम यांनी चतुरसिंगाला सरदारी जहागीर देण्याचे मधाचे बोट लावून पाहिलें. बाजीराव एकपट गोडबोल्या, तर इंग्रज दसपट! पण चतुरसिंगाने जबाब दिला, ‘‘साहेब, आम्ही स्वार्थासाठीं वनवास पत्करलेला नाही. मऱ्हाठी स्वराज्य तमाम मराठ्यांचें आहे. छत्रपति आमचे धनी. या राज्याला धक्का लागला तर आम्ही प्राण खर्ची घालूं. आडवे येतील त्याना कापून काढू. आपला परका पाहाणार नाही.’’
छत्रपतीचा मृत्यू
१८०६ च्या जुलईत चतुरसिंग पुष्कर येथे होळकरास भेटला. तेथें जोधपूरचा राजा मानसिंग यानें चतुरसिंगाची मुद्दाम भेट घेतली. मनसुबा ठरला. जयपूरचा जगत्सिंगहि संघटनेत सामील झाला. उदेपूरच्या राण्यानेंहि चतुरसिंगाला भेटीला बोलावले. `सगळ्यांनाच जातीनें भेटण्यांत माझी सारी हयात खलास व्हायची. ज्यांना माझे हेतू पटतील त्यांनी येऊन मला सामील व्हावें," असा वकिलाबरोबर निरोप पाठवून, चतुरसिंग परत फिरला. बडोद्याचा कान्होजी गायकवाड असाच हिंदवी संघटनेच्या ध्येयानें भटकत होता. त्याची गांठ पडून चतुरसिंग उज्जैनला आला. तेथें त्याला बातमी समजली की छत्रपति शाहू वारले आणि पाजी बाजीरावनें चतुरसिंगाच्या बायको मुलाला कैदेत टाकलें. ज्याच्यासाठीं नि ज्याच्या जिवावर आपण एवढा मोठा व्यूह रचून वनवासांत वणवण फिरलों, तो छत्रपतीच मृत्यू पावल्यानें चतुरसिंगाची केवढी निराशा झाली असेल, याची कल्पनाच करणें बरें.
तरीहि उमेद लवमात्र खचू न देतां, तो तसाच यशवंतराव होळकराच्या भेटीला गेला. पाहतो तो त्याला वेड लागलेलें! आतां मात्र आपल्या राष्ट्राची धडगत दिसत नाही, असें त्याला वाटू लागलें. इकडे साताऱ्यास बाजीरावानें प्रतापसिंहास गादीवर बसवून त्याची मर्जी प्रसन्न करून घेतल्याच्या बातम्या आल्या. आतां साताऱ्यास परत जाऊन आपली शोभा करून घेण्यांत अर्थ नाही, अशा विचारानें तो खिन्न झाला. तेव्हा बापू कान्हो, मल्हार चिटणीस, व्यासराव डबीर वगैरे साथीदारांनी सल्ला दिला. आजवर पुष्कळ भटकलों, पण उपाय चालत नाही. तेव्हा स्वदेशींच जाऊन काय साधेल तें करावें. या बेतानें १८०९च्या जुलईत ही मंडळी धारला आली. तेथेंहि भानगडी चालल्या होत्या. सबब तब्बल दोन वर्षे तेथेंच मुक्काम पडला.
त्रिंबकजी डेंगळ्याचे कारस्थान
एवढ्या अवधीत साताऱ्याच्या बंदोबस्ताला बाजीरावाने नेमलेल्या त्रिंबकजी डेंगळ्यामार्फत बाजीरावानें चतुरसिंगाला अनेक आमिषांचे निरोप पाठवून परत देशी येण्याचे कारस्थान चालू केलें. चतुरसिंग बडोद्यास येऊन तेथे काही मदत मिळते का याचा त्यानें तलास केला. तेव्हा गंगाधर शास्त्र्यानी स्पष्ट सांगितले की, "बडोद्यास अंग्रेजांच्या इतल्ल्याशिवाय झाडाचें पान हालत नाही. येथें तुमची डाळ काय शिजणार?"
चतुरसिंग खानदेशांत आल्याची वर्दी ठेवून त्रिंबकजीनें त्याला मथवण्याचा निर्वाणीचा यत्न केला. त्याच्या वकिलासमोर बेलभंडार उचलून, चतुरसिंगाच्या केसालाहि धक्का लागणार नाही, अशी त्यानें शपथक्रिया केली. रविवार, दि. १० फेब्रुवारी १८११ रोजी भेटीचा दिवस ठरला. गिरणेच्या कांठी चतुरसिंगाच्या छावणीत मेजवानीच्या थाटात त्रिंबकजीने व्यवस्था केली.
सहा घटका रात्रीला गोटाबाहेर खलबताची बैठक केली. तेथें रघुनाथराव गुजर, बापू फडणीस, अप्पाजीराव इंगळे, गोपाळराव न्यायाधीश, अप्पा पुणतांबेकर, त्याचे दोन बंधू बाबाजी केशव पाडलीकर, लाडेखान जामदार, हवालदार खिजमतगार, वगैरे अकरा मंडळी चतुरसिंगासह त्रिंबकजीची वाट पाहत बसले असतां, एकदम एकाएकी चोहोंकडून त्यांच्यावर अचानक हल्ला झाला. हल्लेखोरांनी खडाखड तंबूच्या दोऱ्या तोडून, कनातीखाली सगळ्यांना दडपून धरलें नि अखेर कैद केलें. त्रिंबकजी स्वतः आलाच नाही. सारा गोट लुटून फस्त केला.
पुढे बाजीराव नाशकास आला. तेव्हा या सगळ्या बंडखोरांना त्रिंबकजीनें हुजूरपुढें मुसक्या बांधून उभे केले. रावबाजीनें चतुरसिंगाला रायगडानजीक कांगोरीच्या किल्ल्यावर नि इतरांना निरनिराळ्या किल्ल्यावर तुरुंगात रवाना करण्याचे हुकूम दिले. अखेर हा स्वराज्यासाठी तळमळणारा नि आटोकाट झगडणारा स्वातंत्र्यवीर चतुरसिंग भोसले दि. १५ एप्रिल १८१८ बुधवारी पेशवाई तुरुंगांच्या अमानुष हालअपेष्टा भोगून मृत्यूच्या आधीन झाला! स्वराज्याच्या पुनर्घटनेसाठी तब्बल बारा वर्षे अखिल भारतीय संघटनेची आटापीट करणारा मर्द मराठा कालवश झाला!
"चतुरसिंगांनी राज्यासाठी कष्ट मेहनत करून लढाया फार केल्या. प्राणानिशीं खर्च झाले. चाकरी करून निमक आदा केलें. आपले इमान कायम राखलें. अन्नाची क्रिया जतन केली. असे दुसरे कोणी कामास आले नाहीत.’’
बखरींतल्या एवढ्या शेऱ्याशिवाय चतुरसिंग भोसल्याचे जगांत आज काय राहिले आहे? ना त्याची कोणाला आठवण, ना कोणी त्याच्या स्मृतीला करीत आदराचा मुजरा! ज्याना यश मिळतें त्यांचा होतो बोलबाला. बाकीच्यांच्या नशिबी साधीसुधी आठवणहि लाभत नाही. याला म्हणतात जगाचा धर्म!
(१३) हिंदवी स्वराज्यासाठी दुर्घट प्रवास करणारा प्रभूवीर रंगो बापूजी गुप्ते देशपांडे
याने ता. २ दिसंबर सन १८४६ इसवी मार्गशीर्ष शु. १५ शके १७६८ पराभव नाम संवत्सरे बुधवार रोजी पार्लमेंट पुढे इंग्रजीत दिलेल्या व्याख्यानाचा मऱ्हाठी तरजुमा.
श्री
यादी श्रीमन्महाराज क्षत्रीय कुलावतंस श्री. राजा प्रतापसिंह महाराज छत्रपति सरकार सातारा प्रकर्णी रंगो बापूजीनीं अवल अखेर मोकदम्याचे इंग्रजी लहान बुक छत्रपति सरकारावर खोटी फितुरी तुफानें मुंबई गवरमेंटानीं सदीचा जोरानी तरकट उभी करून जुलूम केला तो दस्ताऐवजी हंसील धरून जागोजागी बोलण्याबद्दल प्रथम मराठीत लिहून नंतर हिंदूस्थानी भाषेनी सांगून इंग्रजी तरजुमा केला.
नंतर साफ इंग्रजीकरितां पेशजीच्या मजकुरात कमजाजती जाहले, सबब पुन्हा इंग्रजीवरून मराठी तरजुमा तारीख १५ नवंबर सन १८४७ इसवी मुकाम शहर लंडन मेजर ग्रेहम हे महाराष्ट्र भाषा बोलतात. त्यांनी सांगितले की मराठी व फारसी व इंग्रजी व फ्रेंच व पोर्तुगीज वगैरे भाषाने जे काही तरजुमे होतात ते ज्या भाषेत करणें त्या शुद्ध भाषेनी हसील मतलब धरून सारांश लिहिला जातो. याजकरिता कमसरस मजकूर जाहला असल्यास वाचणारांनी क्षमा करावी.
---
इंग्लिश बायका व पुरुष ग्रहस्थ
मी हिंदुस्थानातील हिंदू-सातारा दक्षिण प्रातीचा राहणाऱ्या परदेशी आलो आहे. मी दुर्घट प्रवासी केवळ गैरमाहीत आहे. सबब तुम्हां सर्वांपाशी येऊन नम्रतेनें विनंति करितों, कारण माझे धनी छत्रपति सरकार सातारा यांजवरील फितुरी मोकदम्याची चौकशी न करितां फार जुलूम केला आहे. त्यास येविषयीचा मजकूर तुम्हां सर्वत्रास समजाविण्याबद्दल मोठी इच्छा धरून उमेदीनें हजर झालों आहे. तरी मला या सभेत बोलण्याची आज्ञा जाहली पाहिजे.
मी श्री मन्महाराज क्षत्रिय कुलावतंस राजश्री प्रतापसिंह महाराज छत्रपति सरकार सातारा हिंदूपत पातशहाचा चाकर वकील आहे. आणि त्यांच्या हुकूमानीं व त्यांच्या जागी प्रमुखपणे मोकदम्याचा मजकूर तुम्हांस समजाविण्याबद्दल उभा राहिलों आहे. पाहा बरें, छत्रपति सातारा हे पुरातन सारे हिंदू लोकांचे पातशहा असतो तुमचे लोकांनीं तरकटी कामे करून जबरीने राज्यावरून काढून श्रीक्षेत्र काशी मुक्कामी नेऊन कैदेत ठेविले आहे. सदरहू विषयींचा जो मजकूर सर्वांस समजावितों तो तुम्ही कृपा करून श्रवण मनन पुर्तेपणे करून पुरें लक्ष ठेवून आणा.
हें काम पहाण्यास व ऐकण्यास फारच चमत्कारिक आहे. आणि यांत मोठी कृत्रिमें व दगेबाजीची तऱ्हा जी जी केली ती रीत व स्थित तुम्ही ऐकतांच तुमचे कोमल व निर्मल चित्तास तळमळ होऊन चौकशी करण्यास तुम्हीं सर्वत्र सभामंडळी फार मोठी उत्कृष्ठ आणि महान् योग्य अदल नीतीवंत आहो. आणि मी ज्या ज्या गोष्टी तुम्हांस सांगतों व आतां सांगेन त्या तुम्ही पुर्तेपणे मनन करून दिलांत आणाल आणि विचार कराल येविषयींचा मला पुर्ता भरवसा आहे.
पाहा बरें हें कीर्तिमान पुरुष छत्रपतीचें स्वतः सिद्ध पराक्रमाचे हे प्राचीन राजे आहेत. तेच तूर्त काली तुम्हापाशी फिर्याद करितात. आणि मी साफ समजावितो की महाराज छत्रपति निष्कलंक स्वच्छ बेगुन्हा आहेत. आणखी नजरेंत आणा. यांस हिंदुस्थानचे पुरातन मुख्य राजे छत्रपति म्हणतात, हें जगप्रख्यात आहे. तुम्ही म्हणाल की, हे कोणावर फिर्याद करितात? तरी ज्यांजवर फिर्याद करितात ते इंग्लिश लोक, जात क्रिष्टियेन धर्माचे आहेत.
माझे छत्रपति सरकार हिंदू पातशाहा हे सर्व हिंदू लोकांचे धनी मोठे समर्थ आहेत. आणि हे हिंदूंत मोठे उत्कृष्ट वंशांतील आहेत. आणखी सर्व हिंदुस्थान प्रांतीचे राज्य वंश परंपरा करीत आले आहेत. यांचे पूर्वज अति उत्कृष्ट व मोठे पराक्रमी महान् समर्थ मोठे शिवाजी महाराज छत्रपति यांनी इंग्रजी सन १७००च्या सदीमध्ये महाराष्ट्र राज्य स्वपराक्रमें करून मिळविलें. त्यांचेच हल्ली हे वंश आहेत. हें राज्य फार चांगलें आणि मोठे.
या राज्यावर छत्रपतीचा हुकुम बहुत दिवस चालत आला. नंतर पाहा, छत्रपतीचे दोस्तीचे योगे याच राज्यावर हल्ली इंग्लिश हुकुम चालवीत आहेत. माझे छत्रपति मोठ्या वंशातील जगप्रख्यात कीर्तीमान जनजाहीर आहे. आणि हे छत्रपति आपले वडिलांचे जाग्यास कदीम राज्याचे तख्तावर बसलेले तेच हल्ली जबरीने सिंहासनावरून तुमचे लोकानीं काढिले. हा मजकूर सारे हिंदुस्थानांत व कुल इंग्लंड वगैरे फिरंगीस्थानांत सर्वत्र लोकांचे नजरेंत आला आहे. आणि हा मजकूर महाराज छत्रपति आपले तर्फेने मज चाकरापासून तुम्हा सर्वास जाहीर करवितात.
हा मोकदमा त्या लोकांनी अदल न्याय मनांत न आणिता जी जी गैरशिस्त कामे केली तींच ही तरकटे बनावून कसकश्या प्रकारें राज्यास इजा दिली, ती इथंभूत मी विनंति करितो. तरी तुम्ही चित्त देऊन ऐका हो ऐका. हीं, तरकटी कामे कोणते लोकांनी केली म्हणाल? तरी तुम्ही कोण लोक आहां? तरी तेच लोक तुम्ही आहां, पाहा, पाहा, हे काम लुच्चे, दगेबाज, लुटारू, कपटी, द्वेषी, खोटे, तरकटी, चोर, दुषमान या प्रकारच्या साक्ष अशांच्या हाती तुमची हुकमत. त्या लोकानी जबरीने मोठ्या जुलमाने हे बेआबरूचे काम खराब लोकानी केले, आणि मी समजतो की, जसे का तुम्हीच हे काम करविल्याप्रमाणे आहे, असे माझे नजरेत येते. पाहा बरे, त्या लोकानी अशी कामे करण्याचा त्यांचा मगदूर तो काय आहे? या बेअकलेच्या लोकास कोठे कसा जोर आहे म्हणाल तरी पाहा बरे, मुख्य तुमचे नांवावरून व तुम्ही हुकमत दिल्यावरून त्यांचे हाती जोर आहे. रवी त्यांचा मजकूर तो किती आहे? हे मी जे जे बोलतो हे कठोर वाटेल.
परंतु हे खरे किंवा खोटे त्यांच्याच दस्ताऐवजावरून पाहून तुम्हीच विचार करून सत्य सांगा बरे. महान् समर्थ प्राचीन मोठे कीर्तिवान छत्रपतीचे स्वतःचे राज्य हे तुमचे दोस्त असता दगा करून राज्याचा मानमरातब घेऊन, मर्यादा बुडवून, मुलुख व खाजगी दौलत वगैरे सारे लुटून घेतले. पाहा जसा कोणी माणूस मोठा गुन्हेगार असतो त्यास जर नसियेत देणे जाहली तरी काही थोडेसे न्याय करून देतात. तसे जरी म्हणावे अगर पाहावे तरी या राजावर मुळापासून गुन्ह्याचे तरी अगदी ठिकाणच नाही. आणि हा राजा दोस्त असता हे मोठे भयंकर अति क्रूरपणाने हे अनन्धित जनविरुद्ध हे काम जबरीनेच केले. आणि ते लोक काय सबब दाखवितात आणि सांगतात की सातारच्या राजानी फितूर केले तो फितूर तरी कोठे आहे?
पाहा बरे. हा फितूर मुंबई गव्हर्नमेंटानी करून खोटे निमित्य ठेऊन, बदनाम करून त्यांच्या स्वराज्यातून काढून दूर देशी नेऊन ठेविले. आणि तेच लोक म्हणतात की आम्ही मोठे आवरूने खरे काम केले. परंतु सांगा बरें, काय आबरू? पुन्हा मी सांगतों पाहा. हें तरकटी फितूर करणारे मनुष्यास मदत करून मन मानेल तसें केलें. परंतु मजकूर राजास काही एक माहीत नाही व समजाविला नाही. व ज्या साक्षी घेतल्या त्या आंधारांत घेऊन गुप्त ठेविल्या आणि राजास पेचात घालून गुन्ह्यांत आणण्यास ह्या साक्षी घेतल्या. परंतु राजानी जबान्यांच्या नकला मागितल्या असतां दिल्या नाहीत.
आणखी सदरहु विषयी छत्रपतीचे बोलणेहि काहीच ऐकले नाही. (पार्ल. रि. पा. ५६९ व कलनल ओव्हन्सची पत्रे पा. ३६७ व ३६९ क. ५ व गव्हर्नमेंटचे पत्र, पा. ८१ पाहा.) नकला न देता गुप्त ठेवून हे तरकट उभे करून पुन्हा सुरूपणानी (साळसूदपणानी) जसा कोणी चोर व खुनी खराब माणूस असतो त्याप्रमाणे या राजावर मोठी गर्दी करून त्यास मुलुखांतून हाकून देऊन सर्वस्व हरण करून लुटून घेतले. बदनाम करून कैदेत ठेऊन सख्त इजा दिली. अशी ही सारी कामे तुमचे नावानी तुमचे हुकुमतीचे जोरानी त्या लोकांपासून करवली. अथवा तुम्ही केल्याप्रमाणेच बजिनस आहेत.
पाहा, ही बजिनस तरकटी खोटी कामे केली असता ईस्ट इंडिया कंपनीचे डिरेक्टर्स सदरहू कामाच्या तर्फेने मदत करून म्हणतात, "हे काम हिंदुस्थानातील गव्हर्नमेंटानी केले. ते चांगले केले आहे, सबब पुन्हा या कामात पाहावयाचे व चौकशी करण्याचे कारण नाही.’’
आणखी म्हणतात, ‘‘या कामात इंडिया गव्हर्नमेंटाची अब्रू आहे. आणि मान व प्रतिष्ठा व नफा होण्याबद्दल केले ते कोर्टातून कायम जहाले आहे.’’ याप्रमाणे बोलतात. परंतु मी तुम्हांस विचारितो की तरकटी कामे करून मान व प्रतिष्ठा व नफा साधणेबद्दल केले ते केले म्हणे. परंतु ऐका हो. खरे बुडवून खोट्या तरकटी कामानी नफा करून घेऊन तुमची अब्रू व मोठेपणा वाढेल की काय?
सत्य सांगा बरे. आणखी याच कामास तुमचे इंग्लिश लोक काय म्हणतात? फार खराब काम करून हे दुष्ट कर्म केले म्हणोन धिःकार करून साफ त्यास बेअब्रूचे, ते लोक मूर्ख म्हणतात. त्या गोष्टी ऐकू नयेत. व अशी कामे करणारांस शिक्षा करूं नयेत आणि तरकटी लोकांचा पुस्तपन्हा राखणें मदत करणे अशी बेअब्रूची तजवीज या कोर्टानी केली. आणि याच लोकांनी राजाकडे काही गुन्हा नसता मृत्यूपेक्षा जाजती इजा देऊन बदलौकिक केला.
सबब इनसाफ करावा म्हणून मी या लंडन मुक्कामी सहा वर्षे बहुत दिवस राहून सुमार्गे यथान्याय मान योग्यतेनी कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स यास विनंती केली की पुन्हा इनसाफ करावा. हुकूम द्यावा. कारण माझे छत्रपति फार लाचार होऊन राहिले. त्यास इनसाफ द्यावा. म्हणून वारंवार बोलत असता आजपावेतो मनावर घेतले नाही. आणखी पाहा. मी या कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स याच्या दर्शनास गेलो. परंतु माझी भेट न घेता कोटनी दरबारचा दरवाजा झाकून लाऊन घेऊन मला अपमानानेच काढून घालविले. आणि माझे छत्रपतीची अमर्यादा करून सर्वस्वी नाश केला.
आणखी पाडा, खोटचा युगल्या. सांगणारे तरकटी खराब मनुष्यांचे ऐकून इजा दिली, तरकटी साक्षीदार, खोट्या शफता करणारे, खोटे बोलणारे, खोटे लिहून देणारे अशा बनावण्या ज्या ज्या मनुष्यानी केल्या त्या हरयेक मनुष्यास मान व प्रतिष्ठा देऊन खराब लोकांची अब्रू वाढवून इनामे व लाच रुपये व बक्षिसे तरकट करणारास दिलें.
अशा खराब लोकांची मोठी स्तुती करून अब्रू देऊन कोर्टानी मदत केली. आणि कुतर्की खोटा वितंडवाद बेअब्रूने कोर्ट करितात. तेव्हा मी मोठा लाचार होऊन या कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स याजपासून निराश होऊन मला इनसाफाचा रस्ता नजरेत येई ना, तेव्हा अखेर हल्ली तुम्हापाशी मी येऊन विनंती करतो. ऐका हो, अशी दुष्ट कर्मे त्या लोकानी केली ती तुमचे नावानी व हुकुमतीच्या जोरानी छत्रपतीवर मोठा जुलुम गहजब केला तेच तुम्ही लोक आहा. आणि मी तुम्हास विचारतो अशी ही दुष्ट कर्मे केली ती तुम्ही कबूल करता की काय? सांगा बरें, ऐका. हा मी परत या देशाहून स्वदेशी न जाता माझे गोत्र कुटुंबास सोडून सर्वांचा वियोग होऊन बहुत दिवस लाचार होऊन राहिलो. पुन्हा सांगतो. तुम्ही ऐका ऐका हो.
माझे हिंदुस्थानातील लोक सुमारे पंधरा कोट मनुषे आहेत. त्यास मी परत जाऊन काय सांगावे ते ऐका. मी आपले मुखानी त्या लोकांस सांगावे की तुम्ही हिंदू लोक समजता की इंग्लिश लोक सत्य व न्यायनीतीवंत उदार दाते फार मोठे आहेत म्हणता आणि. तुम्ही इंग्लिश लोकांवर भरवसा ठेवून खरे म्हणून समजता, परंतु हें सारें खोटें लबाड आहे. आणि या साऱ्या गोष्टी बाजारगप्पे प्रमाणे आहेत. पहा, मी येविषयींचा पुरा शोध या मुक्कामी प्रत्यक्ष राहून बहुत विचार करून बजिनस आपले दृष्टीनी पहाता इंग्लिश लोकांस खरे आणि अदल इनसाफी म्हणणे हे सर्व व्यर्थ मायावी भ्रम आहे.
इंग्लिश लोक तोंडानी आम्ही दोस्त म्हणतात, परंतु दगेबाज व कृत्रिमी व खोटाई व तरकटी आप्रमाणे बोलतात. आणि बोलतात एक व करितात दुसरेच खोट्या कामास गुप्त म्हणतात. असे लबाड व बेभरवशाचे तरकटी नाना प्रकारचे कृत्रिमानी निपुण भरले आहेत. अशा दुष्ट लोकांचे हुकुमाखाली तुम्ही हिंदू लोक भरंवशानी राहून आपला सर्वस्वी नाश करून घेतला, आणि पुढेहि नाश होणार यांत मला किमपि संशय वाटत नाही. हे इंग्लिश लोक या मुलुखीं दर्यातून येऊन तुम्हांस सर्वत्रांस हरण करून तुमचा कमजोर केला.
त्यांनी तुम्हांस भुलथापी देऊन तुम्हांवर आपला जोर ठेवून हल्ली पहातां मदोन्मत्त मस्त जहाले. आतां या इंग्रेज लोकांशी कोठे कोणीहि भांडण्या व बोलण्या माफक राहिला नाही. आणि हे कित्येक दिवस पेशजी उगेच राहून मोठे खरेपणे भरवसे सफावा जनास दाखवून हल्ली पहातां हिंदुस्थानातील लहान मोठे हिंदू लोकांस इजा देणें, त्यांचा सर्वप्रकारे नाश करणें, फिर्यादीचा इनसाफ चांगले रीतीने करीत नाहीत.
पहा साक्ष सदरहू, अशी जी अनीतीची खराब दुष्ट कर्मे जे करितात त्यास गव्हर्नमेंट मदत करून आपला फायदा साधून घेऊन चौकशी पहात नाहीत. या चोर व लबाड व तरकटी व दुषमान ख़राब बेअब्रूचें असतां त्यांस अब्रू देणे तारिफ करणे खोटे असता खरे म्हणून कुमांडी बोलतात, आणि चांगले व मोठे खरे चालींच्या मनुष्यास तरकटी हातीं घेऊन, हरयत्नेंप्रयत्नें करून खोटे दोष ठेऊन, ज्याचा अधिकार आणि सत्य हक्क त्यास काढून, ज्यास अधिकार नाहीं त्यास देऊन, जनांत नांद त्यांचे दाखवून अति पहातां सर्व हरण करितात. अशाप्रकारें मोठ्या लोकांची अब्रू घेतात. पहा हो, या तरकटी फितुर करणारांस बहादुरी देऊन द्रव्यानसी मदत देऊन फितुर केला. (पार. पा. ४६०) याप्रमाणे तुमचे लोकांची वर्तणूक बेजिनस आहे.
त्यास मी परत हिंदुस्थानांत जाऊन या मुखानी असे मजकूर आपले लोकांस सांगू की काय, तें तुम्ही सांगा बरें? परंतु हे मजकूर माझें लोकांस मी जाऊन सांगणे चांगले वाटत नाही. सबब आधी तुमचा मजकूर तुम्हांसच समजावितो आणि फक्त इनसाफ मागतो. याजकरितां तुम्हांस विचारतो, ऐका हो, तुमचा दुर्लोकिक सांगत स्वदेशी जावे किंवा मला तुम्ही मदत करून इनसाफाची तजवीज कराल? या दोन कलमांतून योग्य दिसेल ते सत्य सांगा म्हणजे त्याप्रमाणे करीन. (हियर हियर हियर).
आणखी पहा. तुम्ही म्हणाल आगर वित्तांत आणाल की अशा गोष्टी आमचे लोकापासून कशा होतील? ते वेडे आहेत? आमचे लोकांनी समजून उमजून असा जुलूम कोणावर हिंदुस्थानांत केला आहे म्हणून अंदेशा चित्तांत आणून तुमचे बोलण्यावर भरवसा ठेवीत नाही म्हणाल, तरी येविषयींचा संशय तुम्ही चित्तांत काहीच सांगू नका.
पहा बरें. हे एक प्राचीन राज्याचे व वंशपरंपरेचे, त्यांचेच हे राज्य. त्यांची ही दशा आहे. दुसरे, याच राजास इंग्रजांनी मदत दरतैवजी पुरे भरंवसे दिले व मुस्तकीम करार ठरले असतां ह्या तुमचेच लोकांनी ठराव तोडून सदरहूप्रमाणे मोठा जुलूम केला आहे. हा आतां मी तुम्हास कळवला. तेव्हा हा असा जुलूम कायम ठेवाल किंवा तुम्ही काही तजवीज कराल हे मला खचित सांगा बरें. आणखी मला खचित आणि खास वाटते की माझे छत्रपति महाराजांवर जो हा बेनाहक जुलूम केला आहे तो तुम्हांस अगदीच माहित नाही. आणि हे काम बिगर हुकुमांनी केले आहे.
आणखी नजरेत आणा. तुमच्या लोकानी या राजास पेचांत आणण्यास फार दुष्ट कर्मे केली, हे जर पेशजी तुम्हांस कळली असती तरी तुम्ही इंग्लिश लोक उगीच राहतों की काय? आणि सदरहू मजकूर तुम्हांस त्या लोकांनी समजू दिला नाही. गुप्त ठेविला. परंतु हल्ली तुम्हांस समजावून जाहीर केला. त्यास आतां तुम्ही उगीच राहणार नाही.
कारण माझी विनंती इतकीच आहे की, तुमचा लौकिक व अब्रू व नांव मोठे आहे, त्यास हा डाग जो लागला तो निर्मळ साफ करण्याबद्दल तुम्ही मला इनसाफ देऊन तुम्ही आपली अब्रू मोठी व जगप्रख्यात कीर्ति आहे म्हणता, त्यास हे खोटे तरकटी काम रद करून आपली अब्रू निष्कलंक आदल नीतीने कराल किंवा नाही हे सत्य सांगा. आणखीही विनंती करितो तरी तुम्ही ऐका. महाराज छत्रपतीचे मोकदम्याचा मजकूर मी थोडे थोडे हसील दस्तैवजी धरून तुम्हास समजावितो.
तो तुम्ही कृपा करून समजून ध्यान हा मला पूर्ण भरंवसा आहे. सदरहू मजकूर तुम्ही ऐकल्यानंतर इनसाफ देण्याविषयीची तजवीज होऊन माझा अर्ज खाली रिकामा जाऊ देणार नाही. कारण ज्याचा हक्क त्याजवर बेनाहक जुलूम केला आहे. येविषयीची चौकशी करणे. व न्यायनीती जाणणारे आणि चित्त पुरवून पहाणारेच हे तुम्ही लोक आहां.
पहा, प्रथमपासून आजपावेतो सुमारे अठ्ठावीस वर्षे गुजरली. बाजीराव रघुनाथ पंडित प्रधान उर्फ पेशवे हे श्री मन्महाराज छत्रपति सरकारचे चाकर यानी इंग्रजाशी लढाई केली. मिनिस्टर म्हणजे प्रधान पेशवे याचा अपजय होऊन त्या लढाई समई इंग्रजी फौजेत युद्धाचे ठिकाणी छत्रपति सरकार बाजीराव यास सोडून इंग्रजावर भरंवसा ठेऊन महाराज आपले संतोषानी तुमचे लष्करांत आले. नंतर छत्रपति सातारियास येऊन आपले राज्याचे सिंहासनावर बसले. त्यावेळी महाराजाचे वय सुमारे वीस पंचवीस वर्षांचे होते. तारीख ६ जुलै सन १८४७ रोजी पार्लमेंटात सर जॉन हाबहाऊस, बोर्ड (ऑफ) कंत्रोल बोलले की, "सातारच्या राजाचे स्वपराक्रमाचे राज्य नव्हे. राजाचे बाप व आजे पेशवे याच्या परजांत होते. हे राजे पेशवे यांच्या परजात जन्मास आले. पेशवे राज्याचे धनी. त्यानी सन १८१८ साली लढाई केली. त्याजपासून राज्य घेऊन या राजास इंग्रजानी राज्य दिले" वगैरे मजकूर बहुत कुतर्की खोटा मनास आले ते बोलले. परंतु हे बजिनस खोटें हे दस्तैवजी पुरावा पहा.
प्रथम बाळाजी विश्वनाथ पेशवे ते अखेर बाजीराव रघुनाथ पेशवे पावेतो दस्तैवजी वहिवाट पहा. छत्रपति सरकारचे पेशवे चाकर हे जनजाहीर आहे. आणि जे जे पेशवे झाले त्यास छत्रपति सरकारांतून पेशवाईची वस्त्रे व सिक्केकट्यार व निशाण देऊन त्या त्या पेशव्यानी छत्रपति सरकारचे नावानी राज्याचा कारभार करीत आले हें जगप्रसिद्ध आहे. आणखी पहा. माधवराव नारायण प्रधान याचा तह सन १७८३ साली इंग्रजांशी झाला. त्या तहावरचा सिक्का पहा.
दुसरे बाजीराव रघुनाथ प्रधान याशी इंग्रजांचे तहनामे झाले. त्याजवर हि सिक्का पहा. हे तह अस्सल डिरेक्टर्स यांजपाशी आहेत. काढून पहा. पेशवे यांचे जे जे सिक्के ते सातारचे राजाचे नावाचे आहेत. आणि मी सांगतो हे याप्रमाणे जनजाहीर आहे. मॅजेस्टी कुइन यांच्या नावानी वजीर लोक कारभार त्यांची मोहर घेऊन करितात. तेव्हा हे इंग्लडचे राज्य या वजिरांचे आहे? आणि कारभार करितात तो मुखत्यारीने करितात. मॅजेस्टी नावाची धनी. तसे छत्रपतीचे नावानी प्रधान कारभार करीत आले. येविषयी जुजबी दस्तवजी हसील पहा.
तारिख १४ ऑक्टोबर सन १७८३ साली छत्रपति सरकारांतून माधवराव नारायण प्रधान यास आज्ञापत्र लिहिले पैकी हशील-
"इंग्रजानी पेशजीचा तह तोडून खटले करून हल्ली तह करितात आणि तुम्ही विनंती लिहितात. परंतु या सरकारच्या राज्यांतील पुढेहि सेवक लोक वगैरे हल्लीप्रमाणे हाती घेऊन पुन्हा अशीच खटली करितील. तेव्हा या तहाचे प्रमाण काय आहे. याजकरितां तुम्ही इंग्लिश पातशाहाचे या तहाचे मंजुरीचे लिहिणे घेऊन पके करणे. आणि बोलणे महादजी सिंदे याचे तर्फेचे आहे, सबब त्यास लिहिणे की, इंग्रेजी पेशजी या मुलुखात येण्यास व्यापाराबद्दल हुकुम घेऊन ठराव करितात, आणि हल्ली अशी कामे करितात. तरी नजर ठेवून पक्का बंदोबस्त करणे."
पहा सर जॉन हॉबहाऊस म्हणतात, राजा कैदेत होता. त्यास या हुकुमावरून कंत्रोलचे बोलणे तरकटी खोटे आहे. आणखी पहा पार्लमेंटरी बुकाचे पान ९०३ हंशील मजकुर महाराज छत्रपति सरकारीत बाजीराव रघुनाथ प्रधान याणी ता. ३१ डिसेंबर १७९६ इसवी अर्ज लिहिला की,
"छत्रपति सरकारानी कृपा करून पेशवाई पदाची वस्त्रे व सिक्के कट्यार पाठविली ती सेवकानी स्वीकार केला. सर्व प्रकारे स्वामीचा आहे. माझा अभिमान हाती धरल्याचा पुरा असावा, खावंदाशिवाय सेवकजनास दुसरा त्राता नाही. त्राता स्वामी आहेत. दोन्ही हस्तक तिसरे मस्तक स्वामीच्या पायावरी ठेवला आहे."
असे असता हॉबहाऊस दरबारात बोलले की मराठी राज्याचे धनी पेशवे. परंतु कंत्रोलचे बोलणे खोटे आहे. पहा बजिनस बाजीराव प्रधान चाकर मराठी राज्याचे धनी महाराज छत्रपति सरकार आणखी पहा, तारीख १० आक्टोबर सन १८१० इसवी. या पत्रातील हशील मजकूर -
"श्रीमंत मातुश्री माईसाहेब यांची स्वारी पुण्यास आली. ते समयी तेथील तरतूद सेवकाची पाहून बहुत संतोष मानून महाराज छत्रपतीजवळ तरतुदिची तारीफ केल्यावरून महाराजास परमानंद होऊन सेवकाचा गौरव करून आज्ञापत्र छ. २ रमजानचे आले, तें सेवकांनी पाहुन परमसंतोष जाहला. सेवकाचे सेवाधर्माचा महाराजांनी गौरव केला. तेणेकरून सार्थकता माझी जाहली."
मिती आश्विन शु।। १२ शके १७३२ प्रमोदी नाम संवत्सरेचे हे पत्र बाजीराव प्रधान याचे स्वदस्तुरचे आहे. पुन्हा समजावितों, पहा. तारीख २४ फेब्रुवारी सन १८११ इसवी या पत्रांतील हशील मजकूर-
"श्रीमंत क्षत्रिय कुलावतंस महाराज राजश्री छत्रपतीचे सेवेशी विनंति-सेवक बाजीराव रघुनाथ प्रधान कृतानेक विज्ञापना तारीख छ २२ मोहरम सन इहिदे अशर मया तेन व अलफ येशवंतराव होळकर यांचे बोलणे कीं, माझा प्राण जातो त्यापेक्षां मजला आज्ञा जाहाली असता जेजुरीस यावयाचे अथवा आज्ञा न जाहली तरी जेजुरीस येऊन देवदर्शन घ्यावयाचे. होळकर यांचे वास्तविक प्रकृतीस ठीक नाही. म्हणोन जेजुरीस देव दर्शनाकरिता येणार किंवा देवदर्शनाचें निमित्याने इकडे जबरदस्तीने येणार, कोणते मतलबाकरिता येतो याचा निश्चय नाही. त्यांस होळकर याचे आमचे वाकडे कसे, त्या सविस्तर मजकुराची समक्ष म्हणजे प्रतापसिंह महाराज छत्रपती सरकारांत विनंति केलीच आहे.
होळकराचें इकडे येणे झालें असता मी पुण्यास रहावे हे मसलतीस येत नाही. याजकरितां मी विजयदुर्गांस जाऊन राहावयाचा बेत केला आहे.
होळकर इकडे आल्यावर प्रसंग कसा पडतो याचा नियम आज समजत नाही. महाराज. छत्रपतीची स्वारी सातारियास पेशजी परशराम भाऊ पटवर्धन याणी चिरंजीव राजश्री चिमणाजी रघुनाथ यास यशोदाबाईचे मांडीवर बसवून चिमणाजी माधवराव असे पेशवाईचे शिक्के व वस्त्रे छत्रपति सरकारातून आणून दिली. तसेंच यशवंतराव होळकर याणी चिरंजीव राजश्री विनायक अमृतराव यास पेशवाईची वस्त्रे छत्रपति सरकारांतून आणविली. पूर्वी असे बखेडे झाले कारण सातारा जागा नाजुक बाकी नव्हे. बलकुबलींस राहावयाचे उपयोगी नाही. सबब पूर्वी शिवाजी महाराज याणी रायगडासारख्या जागी बसवून दौलती केल्या.
प्रसंगाचे दिवसांत सातारियास खासा स्वारी राहणे हे माझे व सदाशिव माणकेश्वर याचे विचारास येत नाही. रायगड जागा चांगली मजबूत. कोणी म्हणेल की तेथे फौजा पाठवून वस्त्रे आणू किंवा बखेडे करू तरी होणार नाहीत. याजकरितां स्वामीची मर्जी मुबारकेत आल्यास यशवंतराव होळकर दक्षणेत येऊन कोठे लढाईचा प्रसंग न करिता कराराप्रमाणे नर्मदापार माघारा गेल्यास व ही मसलत शेवटास गेल्यावर मग स्वामीनी सातारियास यावे, याचे मनन करून ही मसलत बाहेर कोठें न फोडता आज्ञोत्तर यावें. सेवेशी श्रृत व्हावे. हे विज्ञापना."
नंतर पाहा उत्तर हंशील मजकूर "राजमान्य राजश्री बाजीराव रघुनाथ पंडित प्रधान यासी आज्ञा केली ऐशीजे. तुम्ही विनंती पत्र छ २२ मोहरमचे पाठविले. ते प्रविष्ट झाले. यशवंतराव होळकर दक्षिणेत येणार. त्यास सातारा जागा नाजूक. किल्ला हलका. म्हणोन तुमचे व सदाशिव माणकेश्वर याचे विचारांत येते की येथे राहू नये. त्यापेक्षां जे तुमच्या विचारांत येईल त्यांत आमचा रुकार आहे. तुमचा विजयदुर्गास जाण्याचा बेत ठरेल तेथे आमची सोय राहण्याची घडल्यास बहुत चांगले. स्वामीसेवा निष्ठेनी करून पूर्वी संकटे पडली ती परिहार झाली, पुढेहि ईश्वर पार करील. जाणिजे छ २९ मोहरम सु. इहिदे अशर मया तेन व अलफ. बहुत काय लिहिणे सूज्ञ असा."
या पत्रावर सिक्का मोर्तबसह आहे. आणखी पहा. गवरनर जनरल याचे पत्र पार. पान ५५६ ता. २६ सप्टेंबर सन १८१८. हे पत्र पार्लमेंटांत समजावून ह्यूम मेंबर यांनी दरबारांत सर जॉन हॉबहॉऊस भरसभेत खोटें केलें तो मजकूर पहा. (गव्हर्नर जनरल यांचे ऑ. एलफिस्टन यास पत्र पैकी कलम ६ व २८)
"तुम्ही सातारचे राजाविषयींचा मजकूर लिहिला तो कळला. सातारचे राज्याचे हे कदीम राजे हे मूळ प्रकर्ण आहे. आणि हे असल मुख्य घर आहे. आणखी या राज्याविषयीं विचार करून राजनीतीनी पहाता सातारच्या राजानी हे राज्य आपले स्वपराक्रमानी मिळविलें आहे. याजकरिता राजांस मुलूख तुम्ही जाजती आढवून द्यावा. येविषयीं गवरनर जनरल याणी पुर्तेपणे कबूल करून मुकरार ठरविलें आहे तुम्हांस कळावें."
"रास्ते व गोखले यांची जहागीर निरा व कृष्णा नदीचे मध्ये आहे. त्यास हल्ली मुलूख आपले मुलुखांत मिळवून घेतां आपली मिळकत बेरीज सरळ वाढेल. परंतु तो सदरहू नेमाप्रमाणे पहातां सातारचे राजाचा मुलुख कमी होईल. आणि यांत मुख्यत्वें मोठे कारण जरूर आहे की सातारचे राजास सन्मानेंकरून मोठा श्रेष्ठपणा देऊन त्याचा संतोष राहण्याबद्दल तजविजीने फार चांगले करून घ्यावें. आणि राजास सुखांत निरंतर आनंदांत रहावा हेच मुख्यत्वें करून करणे तुम्हांस योग्य आहे."
पहा ऑनरेबल ईस्ट इंडिया कंपनीचे डिरेक्टर्स यांनी महाराज छत्रपतीस मोठे मानमरातबांनी पत्र स्तुतिपूर्वक लिहून तरवारसह महाराज छत्रपतीकडे पाठवितात. त्यात हल्ली द्वारा वर्षे जाहली. त्यांत लिहितात की महाराजांनी आपले राज्यांत राजकारणी सगुण गातीनी अठरा वर्षेपावेतों काम फार चांगले जनजाहीर केले. त्याजवरून कोटांनी तारीफ करून योग्यता जाणून तरवार पाठविली. आणखी पहा. राजानी आपली रयत फार खुषीत ठेविली. प्रजेचे चांगले रीतीनी संरक्षण करितात. म्हणून हा योग्यतेचा मान सत्कार करून पाठविला. (पार्ल. पा. १२६८)
३. श्रीमन्महाराज राजश्री छत्रपति साहेब
संस्थान सातारा
इंडिया हौस लंडन
ता. २९ डिसेंबर सन १८३५
महाराजास ईश्वरानीं मोठेपणा दिला आहे. त्या अन्वयेंच महाराजांची स्थिति फार चांगली असून लौकिक व कीर्तिवान योग्य आहा. महाराजांची स्तुति मुंबई गव्हर्नमेंटानी हमेशा वेळीवेळी लिहिली आहे की महाराजाची मोठेपणाची चाल आणि सूज्ञता फार उत्कृष्ट मोठ्या योग्यतेची आहे. आणखी महाराजानी आपल्या राज्याचे काम फार चांगले सुमार्गाचे रीतीनी चालवून प्रजेचे संरक्षण करितात, हे आम्हास कळून आम्ही फार खुषी जाहलो आहो.
"अशा प्रौढ चांगल्या रीतीने चालतात हे महाराजास फार योग्य आहे. त्याजवरून सर्व लोकांत माहाराजांचा मोठेपणाचा लौकीक आहे. त्याप्रमाणेच या चालीस सर्व संतोषी आहेत. आणखी महाराज सर्वाहून फार मोठे कीर्तिवान् आहेत. त्याप्रमाणेच आम्ही महाराजांचा स्वच्छ दील व निर्मल चाल नजरेत आणून फार फार संतोष मानतो. आणि महाराजानी आपले राज्यांत सर्वत्र जनास सूख होण्याबद्दल दव्य खर्च करून नवीन कामे रस्ते व सडका व नळ तलाव व इमारती व पूल वगैरे कामे फार मेहेनतीने तजवीज करूनच केली. आणि मुलखाचा बंदोबस्त चांगले रीतीने ठेविला आहे. त्याजवरून हिंदुस्थानात सर्व लोकांचे नजरेत महाराजांचे योग्यतेप्रमाणेच अब्रू व कीर्ति फार मोठी वाढत चालली आहे.
आणि या चालीचा कित्ता दुसरे राजेरजवाडे वगैरे लोकांनी घेऊन चालावे अशी सुरेख मोठ्या नामदारीची शिस्त व शिरस्ते व पद्धती योग्य आम्ही दिलांत आणून मोठे संतोषी होऊन मान्य करितो. आणि सदरहूप्रमाणे महाराजांची योग्यता व उत्तमपणा मोठे प्रौढीचा दिलात आणून सर्वत्र डिरेक्टर्स याचा एकविचार होऊन आम्ही महाराजाकरिता एक तरबार पाठवावी असे सर्वाच्या अनुमते ठरून कबूल होऊन ही तरवार मुंबई गव्हर्नमेंटाचे मार्फतीने आम्ही रवाना केल्या अन्वये महाराजास पावती होईल. ती घेऊन महाराजानी कोर्टाचे दोस्तीची यादगिरीबद्दल उत्तम प्रकारचा मान देऊन तरवार ठेवितील."
महाराजास ईश्वरानी निरंतर सुखी ठेवावे हे आम्ही चाहत आहों.
महाराजांचे भरंवशाचे दोस्त
क्लार्क चेअरमन
जेम्स रिविट कारन्याक
डेप्युटी.
पहा, ऑनरेबल कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स याणी महाराज छत्रपतीस मानमरातब प्रतिष्ठा विशेष जाणोन कोर्ट मोठे हर्षयुक्त होऊन हे पत्र लिहिले. सातारा मुंबई नजिक आणि इतल्यात आहे. त्यास हे असा वाटून दुष्मानी करून महाराजाची अब्रू जगप्रख्यात कीर्तिमान प्रतिष्ठा मोठी असता या वेळीच्या सुमारे प्रथम निंदा व तस्कट करावयास प्रारंभ केला तो पाहा. महाराजाचे दुष्मान व खराब व हलके व तरकटी खोटे लोकांस मुंबई गव्हर्नमेंटानी जमा करून अश्या मनुष्यास हाती धरून मदत करून हल्ली पावेतो सुमारे सहा सात वर्षे या दुष्ट लोकांनी आपला मतलब व फायदा साधण्याबद्दल अशी कामे केली.
हा मजकूर मी पूर्वी तुम्हास सांगितला आहे. आणि इकडे मला छत्रपतीनी पाठविण्याचे कारणहि दुष्ट कर्पे जी केली त्यांविषयी मुंबई गव्हर्नमेंटात बेदाद होऊन आम्हांवर बेनाहक जुलूम करून सदरहूप्रमाणे प्रसंग गुजरिला आहे. येविषयीचा मजकूर इंग्रजी दरबारांत जाहीर करून बंदोबस्त करून यावा म्हणून पाठविले. त्याप्रमाणे मी या मुकामी सहा वर्षे राहून इनसाफ मिळण्याविषयी प्रयत्न करीत आलों. परंतु कोर्टात बेदाद होऊन केले श्रम ते निर्फल जाहाले. सबब सदरहू मोकदम्याचा मजकूर तुम्हांस तपशीलवार समजावीत आहे तो ऐका हो.
पहा हो. काही दोस्त सत्य व न्यायनीति जाणणारे अदल इनसाफाविषयींचे मदतीचे दोस्त लोकानी मिळून विचार करून, महाराजावर मोठा जुलूम केला आहे. सबब पुन्हा इनसाफ करावा म्हणून येविषयीचा मजकूर ईस्ट इंडिया कंपनीचे डिरेक्टर्स यांसी वेळोवेळी बोलले. पहा. अवलीपासून आजपावेतो मी व माझे दोस्तानी तजविजीनी फार मेहेनत केली. परंतु ती मेहेनत जी जाहली ती आजपावेतो व्यर्थ गेली. परंतु तेव्हा कोर्टापाशी काय मागत होतो आणि हल्लींहि कोर्टापाशी काय मागतो ते तरी तुम्ही नजरेंत आणा. पहा. पेशजी इनसाफ जाहला नाही. सबब पुन्हा इनसाफाचा हुकूम देऊन खरेपणानी चांगली तजवीज करावी हेच मागतो. परंतु आणखी सांगतो राजाचे मोकदम्याचा इनसाफ न करितां तुम्ही मेहेरबानी करून महाराज छत्रपतीची सुटका करावी म्हणून कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स याजपाशी असे काही मागितले नाही.
मी व माझे दोस्तांचे बोलणे की साफ जो ज्या सर्वत्राचा हक्क जे इंग्रजाचे अमलाखाली आहेत ते इंगलीशस्थान प्रांतीचे मुलुखीं अगर हिंदुस्तानप्रांती असो सदरहूविषयीं सर्वत्राचें मजकुराची तजवीज पहाणे तपास करणे खरे खोटें हे अदल नीतीने पहाणे बरहक्क असेल (ते) करणे हेच हुकमतीचे मुख्य काम आहे. कारण कोणीहि गुन्ह्याचे वहिमत आला असल्यास अगर जरी तो गुन्हेगार आहे असे वाटले तरी चौकशी करून खरे किंवा खोटें न्याय करून पाहिल्याखेरीज उगीच कोणी कोठेहि अन्यायदार होत नाही. आणि जो जोरानी त्यांनी अन्याय केला म्हणतो तोहि कबूल करीत नाही, याजकरिता पुन्हा चौकशी करावी म्हणून मी हेच मागत आलों. त्या अन्वयेच हल्लीहि तुम्हां सर्वत्रांपाशी मागत आहे.
महाराज छत्रपतीची दोस्ती असता मुंबई गव्हर्नमेंटानी दुधमानी करून महाराजांचा घात करण्याबद्दल हे गव्हर्नमेंट नेहमी चित्तापासून द्वेषबुद्धि घरून तरकटी खोटी दुष्ट कामे चालविण्यास कधीहि निशीदिनी ढिलाई केली नाही. आणि अशी जी जी दृष्ट कर्म केली ती जनांत प्रकट न होण्याबद्दल गव्हर्नमेंटानी प्रथमपासून तरकटी मतलब केला तो तरी पहा या मोकदम्याचे कागद गुप्त गुप्त गुप्त दाबूनच ठेविले होते. परंतु, दिनावधीनी सदरहू मोकदम्याचे कागद पार्लमेंटचे हुकुमानी छापून प्रकट जाहाले. त्यास त्या कागदांत खरा मजबूद दस्ताऐवजी पुरावा साफ निश्चयेंकरून संकलित समाजावितो तो तुम्ही सर्वत्र कृपा करून नजरेत आणा.
महाराज छत्रपतीविषयी मुंबई गव्हर्नमेंटानी फार रागास येऊन द्वेष करण्याचे मुख्य मूळ तरी काय म्हणाल तेच सत्य सांगतो पहा, छत्रपतीसरकारच्या जाहागिरीदाराच्या मुलुखाविषय सरहद्दीचा तंटा प्रथम याच मुंबई गव्हर्नमेंटानी खटला उत्पन्न करून राजाचे जाहागिरदार घेण्याचा दगेबाजीने मतलब केला. त्याज वरून महाराज छत्रपतीनी तहनाम्यातील ठरावाप्रमाणे हे जहागिरदार आमचे आहेत. म्हणून मुंबई. गव्हर्नमेंटांशी वारंवार बोलत असतां, ये विषयीचे बोलणे न ऐकता काही जहागिरदारांचा मुलुख याच मुंबई गव्हर्नरमेंदानी घेतला.
परंतु पहा दगबाजी करून मतलबी इनसाफाचे काम या मुंबई गव्हर्नमेंटाचे कौसीलदार व चाकरांच्या लिहिण्यावरून गैरइनसाफानी आपला फायदा साधून घेण्याबद्दल खोटे ठराव करून घेतले. त्याजवरून महाराजांनी लिहिले की तहनाम्याचा अर्थ करून ऑनरेबल कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स ठराव करून सांगतील त्यास आम्ही राजी आहों याप्रमाणे पत्रे इंग्रजी सरदार माहितगारांस लिहिली. नंतर कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स याणी राजाचे हक्काविषयी तहनाम्याचे कराराप्रमाणे हे जहागिरदार राजाचे तर्फेस संमत देऊन ते कोर्टानी लिहून पाठविले. परंतु सदरहू या ठरावाचे पत्र (ता. २६ सप्तेंबर सन १८३४ चे पत्रातील हंसील (पार्ल - बुक पान ४५५) ‘‘पेशवे यांचेवेळेपासून या जहागीरदारावर महाराजाचा हुकुम चालत आला आहे. जहागिरदारांचे करारांत पुत्रपौत्रादि म्हणून लिहिणे नाही. जहागिरदारास औरस पुत्र वारस नसल्यास महाराजानी दत्तक घेऊन चालवूं नये. जहागिरदारांचे करार ठरल्याप्रमाणे जहागिरदारांचे मागे या जहागिरा महाराजांकडे येतात. जहागिरदारांचे मागे इंग्रजी गव्हर्नमेंटाची बहादरी खुंटती.’’) कोर्टानी मुंबई गव्हर्नमेंटाकडे पाठविले असता या गव्हर्नमेंटानी समजून उमजून दगेबाजीने कपट करून हे पत्र गुप्त ठेविले.
आणि हे पत्र राजास दिल्हे नाही. आणखी पहा. सदरहू प्रमाणे कोर्टातून ठराव राजाचे तर्फेस होऊन आला आहे हे प्रथम राजास माहीत नव्हते. याजकरिता मुंबई गव्हर्नमेंटास जहागिरदाराचे मुलुखाविषयी हमेशा लिहीत होते. परंतु या गव्हर्नमेंटानी राजाचे लिहिण्याची परवा न करिता उत्तर दिले नाही. आणि राजास पेचात कपट करून खोट्या बनावण्या करून तरकटे उभी करीत गेले.
सदरहू प्रमाणे ठराव कोटीतून होऊन आला असता मुंबई गव्हर्नमेंटानी हा हुकुम तोडून दाबून गुप्त ठेविला. व बंदोबस्तहि केला नाही. सबब अशा कामावरून महाराज छत्रपतीस फार राग येऊन सदरहू विषयीचा विचार केला की आपले तर्फेनी मजकूर बोलण्यास वकील लंडणास पाठवावे. त्यावेळेपासून नशिबाने मागे घेतले. राजानी लंडणास वकील पाठविण्याचे नांव घेतांच या मुंबई गव्हर्नमेंटास क्रोध येऊन द्वेष करून नाश करण्याबद्दल दुष्मान व तरकटी हाती घेऊन राजास बुडविण्याबद्दल मुकरार तरकटी काम चालविले.
तुम्ही जहागिरदार घेतले सबब आम्ही लंडणास वकील पाठवितो बोलले, त्याजवरून या गव्हर्नमेंटास वाटले की राजानी आमची फार अमर्यादा केली. अशी दुष्टबुद्धीने सदरहू तरकटे उत्पन्न केली. परंतु मी तुम्हास विचारतो राजानी प्रत्यक्ष लंडणास वकील पाठवून आपला मजकूर समजाविणे, आपले हक्क राज्याविषयी बोलणे हे मोठे महान् पातकाचे काम केले आहे? पहा. ऐका ऐका हो. हा राजानी केवढा अन्याय केला व हा अन्याय होतो की काय? हे तुम्ही सांगा बरे? आणि चमत्कार नज़रेत आणा. हाच गुन्हा माफ करीत नाहीत हे अब्रूचे काम पहा.
सदरहू मजकूर मी सांगतो तो पहा. मी हिंदुस्थानचा राहणारा आणि या कामास माहितगार हे ज्याणी गैरशिस्त काम केले त्या लोकांस इंग्रज म्हणतात. आणि मी हा मजकूर जो समजाविला त्यावरून तुम्हास संशय येऊन माझे बोलण्यावर भरवसा धरून विश्वास ठेवणार नाही. आणखी तुमचे दिलात संशय येण्यास ही गोष्ट सहजी आहे. परंतु माझी सेवकाची चाकरी तुमचे पुढे हीच आहे की मी जे जे या मुखानी सांगितले. ते तुम्हा सर्वत्रास साफ़ निश्चयरूप सत्य स्मरून खरे तेच बजिनस दाखविणे य समजाविणे हेच माझे मुख्य चाकरीचे काम आहे.
आता मी खचित साक्षी मुद्यापत्त्यानिशी कागदोपत्रीच दाखवून सांगती ते ते हे सारे खरे आहे आणि या साक्षी कोणाच्या आहेत असे तुम्ही म्हणाल तरी पहा. या साक्षी बजिनस गव्हर्नमेंटाच्याच आहेत. त्या कशा आहेत म्हणाल तरी प्रत्येक निरनिराळ्या असून मुंबई गव्हर्नमेंटाचे मंडळीनीच ही पत्रे लिहिली आहेत. त्यापैकी ही कलमे अदुटी, अपुरी, अधुरी तुकडे तुकडे थोड्या मजकुरात लिहिली. अशीच दगेबाजीने त्या लोकांनी कामे केली. परंतु ज्यास काही संशय असेल त्यांनी हे कोठे पहाणे म्हणाल तरी जे कागद पार्लमेंटातून छापिले त्यांतीलच हे दस्ताऐवज आहेत.
आणखी पहा, या कागदांतून जो काही मजकूर जाहीर जाहाला आहे तो आणि महाराज छत्रपति यानी मुंबई गव्हर्नमेंटाचे कपट कृत्रिम दगेबाजी जहागिरदारांविषयी केली हे दिलात आणून वकील लंडणास पाठविण्याचे योजिले, त्या वेळी राजाचे दरबारात रेसिदटाचे कामावर जनरल लॉडविक होते. त्यास राजानी सांगितले की मुंबई गव्हर्नमेंट जहागिरदाराविषयीचा बंदोबस्त करीत नाहीत. सबब सदरहू मजकुराच्या बोलण्यास वकील आम्ही लंडणास पाठवून आमचा मजकूर तेथे बोलूं. (पहा याद ता. १६ जून सन १८३६ पार्ल. बुकाची पाने ५५३ व रेसिदंटाचे पत्र पान ५५१). नंतर जनरल लॉडविक रेसिदंट यानी आपले मनांत विचार करून सांगितले की या कामावरून महाराजास काही चांगले फल निर्माण होणार नाही. याजकरिता महाराजानी असे करूं नये. याजवरून त्या वेळी महाराज छत्रपतीनी वकील लंडणास पाठविण्याचे मना केले. परंतु मुंबई गव्हर्नमेंटानी तरकटी फितूर खोटे उभे करण्यास आळस केला नाही.
मुंबई गव्हर्नमेंटानी गुप्त म्हणजे चोरटे कमिशन मि. विलोबी व कर्नल ओव्हन्स या उभयतांस ता. १० आक्टोबर सन १८३६ (रोजी साताऱ्यास पाठविले. पा. ५२) हें कमिशन सिक्रेट म्हणजे चोरटे चौकसनीस आधी चौदा पंधरा दिवस साताऱ्यास येऊन, तरकटी फितुराची बनावणी करून, नंतर राजास पत्र गव्हर्नराचे ता. २४ आक्टोबर सन १८३६ चें (पार्ल. पा. ६१) आणविले, ते कमिशन यानी महाराजांकडे पाठवून देऊन आपले बंगल्यास राजास बोलावितात! पहा. हे प्रथमच मस्त होऊन मगरूरी करून मोठा जोर ठेवून राजाधी अमर्यादा केली. तत्रापि राजा मोठा फार सूज्ञ. त्यानी आपले चित्तांत आणिलें की इंग्लिश गव्हर्नमेंट आपल सर्व भरंवसा व दोस्त आहेत; याजकरिता आपण जाऊन त्यांस भेटावे, म्हणून ता. २६ आक्टोबर सन १८३६ या रोजी छत्रपती या कमिशन यांचे बंगल्यास जाऊन भेट घेऊन बोलणे जाहाले. (पार्ल. पा. (३४७) थोडे हंशील दाखवितो. ब्राम्हणांची आणि आमची दुषमानी आहे वगैरे मजकूर बोलून नंतर कमिशन यांस सांगितले की, तुम्ही अंताजी ब्राम्हण यास सवाल करावा की हा फितुर प्रथम कोणी उभा केला?
(पा. पा. ३४४) नंतर या चोरट्या कमिशन यांनी कपटबुद्धीने कसें काम चालविले ते पहा! हा या फितुरीचा प्रथम मुद्दा गव्हर्नमेंटाचे अंगी शाबूद जाहाला आहे तो पहा, अंताजी ब्राम्हणास सवाल, हा फितुर प्रथम राजानी किंवा तूं उभा केलास? (पार्ल. पा. ३१३). आणखी पहा. या कमिशनापाशी राजानी या मोकदम्याच्या त्या मनुष्याच्या जबान्याच्या नकला मराठी मागितल्या. (पार्ल, पा. ३४८). परंतु राजास जबान्याच्या नकला दिल्या नाहीत. नंतर कित्येक दिवसांनी ओव्हन्स यानी सांगितले की. गुप्त कमिशन, सबब नकला द्यावयाच्या नाहीत! परंतु राजानी तीनचार महिन्यावर जास्ती दिवस वाट पाहिली, परंतु गव्हर्नमेंटानी येविषयीची काही केली नाही. सबब छत्रपति सरकारनी पत्र ता. २३ मार्च सन १८३७ (पार्ल. पा. ५६९) रोजी सर रोबर्ट ग्रांट गव्हर्नरास लिहून पाठविले. त्यापैकी थोडी अक्षरे-
"आसाहेबानी ता. २४ आक्टोबर सन १८३६ (पार्ल. पा. ६१) या रोजी पत्र पाठविले. त्याप्रमाणे कमिशनाची भेट घेतली. त्या समयी जबान्या इंग्रजी वाचून दाखविल्या. तेव्हा कमिशन यास आम्ही सांगितले या लोकांच्या हिंदवी कच्च्या मजकुराच्या जबान्याच्या नकला पाठवाव्या. परंतु कमिशन नकला न देता व न भेटता निघोन गेले. आणि या कामास मुदतहि फार जाहाली. हा अंदेशा आणून विलायतेस व कलकत्त्याचे उत्तर एक प्रकारचे आल्यास आणि मग आम्ही बोलल्यास तुम्ही अगोदर का बोलला नाही असे होईल. येविषयीचा जबाब कळवा, नाहीपेक्षा आम्हांस येविषयीचा मजकूर इंग्रजी सरकारात बोलणे प्राप्त आहे."
पहा सदरहू पत्र सरकारानी मुंबईस मजकडे सर रॉबर्ट ग्रांट गव्हर्नर याची भेट घेऊन देण्याबद्दल पाठविले. त्याप्रमाणे मी गव्हर्नराकडे गेलो. परंतु माझी भेट न घेता चाकराबराबर सांगून पाठविले की तुम्ही वाथेन चीफ सेक्रेटरी याची भेट घेऊन त्याजपाशी पत्र द्यावे. त्याप्रमाणे सेक्रेटरीची मी भेट घेऊन सदरहू पत्र दिले. नंतर हे पत्र दोन दिवस ठेवून घेऊन राजाचे पत्र मजजवळ परत दिले. आणि सेक्रेटरी यानी सांगितले पत्र गव्हर्नर घेत तुम्ही राजाकडे परत पाठवावे. तेव्हा राजा लाचार होऊन आश्चर्य वाटले, नंतर गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंड व पुराणे दोस्त डॉ. जॉन मिलन यास पत्र लिहून पाठविली. त्यानंतर गव्हर्नर जनरल यानी तो. ७ आगष्ट सन १८३७ चे पत्र लिहिले. (पार्ल. पा ६३७) पैकी हशील.
"सातारचे राजाची मर्जी आहे की तुम्ही त्याचा सर्व मजकूर समजून घेऊन लॉर्ड साहेबास निवेदन करावा. येविषयी गव्हर्नर जनरल इन कौन्सिल फार खुषी आहेत. परंतु तुमची पत्रे येणे ती मुंबई गव्हर्नर इन कौन्सिल याजकडून शिरस्तेप्रमाणे यावी."
पहा. गव्हर्नर जनरल लिहितात की डॉ. यानी सातारियास जाऊन राजाची भेट घेऊन मजकूर लिहून पाठविण्याबद्दल हुकूम दिल्हा. परंतु मुंबई गव्हर्नमेटानी हुकूम तोडून सातारियास जाण्याचा हुकूम दिल्हा नाही. ऐका हो. हे जर मुंबई गव्हर्नमेंट खरे होते तरी डॉक्टरास कां भीत होते? आणि हे डॉक्टर कोण म्हणाल? तरी इंग्रजी कंपनीचे पेन्सनदार! हे तुमचे जातीचे होते! पहा या गव्हर्नमेंटाचे अब्रूचे काम! पहा. वाशीन चीफ सेक्रेटरी मुंबई यानी जॉन मिलेन यास पत्र ता. २५ सप्टेंबर सन १८३७ (पार्ल. पा. ६४१) पैकी हंशील मजकूर तुम्ही सातारियास जाण्याविषयी लिहिले त्यास तिकडून पुन्हा उत्तर `आल्याशिवाय हुकूम देऊ शकत नाही.`
त्या समयी महाराजानी विचार करून मनसुबा व मदतीस जे हिंदुस्थानात इंग्रज लोक आहेत त्यापैकी या कामास योग्य आणि प्रबुद्ध असे नजरेत आणून डॉ. जॉन मिलन- हे मुख्य वैद्य मुंबई लष्कराचे काम केलेले हे पेन्सनर मुंबई मुक्कामी रहात होते. त्यानी कंपनीची नौकरी सुमारे ५० वर्षे केली. ते डॉक्टर- यास छत्रपति महाराजानी पत्र लिहिले की आमची फार इच्छा आहे की तुम्ही सातांरियास येऊन आमची भेट घ्यावी. (परंतु) या गव्हर्नमेंटानी सातारियास जाण्याची रजा दिली नाही. तेव्हा गव्हर्नर जनरल यांच्या हुकूमाप्रमाणे राजाच्या तर्फेनी पत्रे लिहून पाठविली. त्यासहि दगेबाजी कृत्रिमे केली. आणखी पहा. सातारियास पत्र पोष्टांतून जात येत होती. ते लखोटे मधचेमधीच घेऊन फाडून सारे कागदाच्या नकला घेतल्या. हे बेअब्रूचे? कसे काम? ते पहा. ऐका हो, या मुंबई गव्हर्नमेंटातील कामगार लोकांनी पत्रे लिहिली. त्यास मिनिट्स म्हणजे दरबारी मंडळीची संमतपत्रे, यापैकी जुजबी हंशील मजकूर-
ता. ३० जानेवारी सन १८३९ चे डॉ. जॉन मिलन यास मुंबई गव्हर्नमेटाचे पत्र :
"डॉ. मिलन यास जाहीर व्हावे की तुम्ही कंपनीचे पेन्सनर आहां. सबब सातारचे राज्याविषयीचे मजकुराचे काही एक कागदपत्र गव्हर्नमेटास तुम्ही पाठवू नयेत. आणखी राजास अथवा त्याचे वकीलासहि तुम्ही कागदपत्र पाठवू नयेत व त्यासी बोलणे जनजाहीरीने अथवा गुप्त मार्गे केव्हा कधीहि भाषण तुम्ही त्यासी करु नये."
(सह्या) फेरीस, अंडरसन, डनलॉप.
पहा हे पत्र! मि. जेम्स फेरीस ऑक्टिंग गव्हर्नर व अंडरसन व डनलॉप हे दोन कौन्सिलर ऐशा त्रिवर्गाच्या सह्या सदरहू कागदावर आहेत. हे तिघेहि कंपनीचे चाकर कारकुनी दप्तर खात्यातील आणि याच अशा लोकांस ऑन कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स यानी मुंबईत गव्हर्नमेंटाचे कारभाराचे कामावर नेमून ठेविले होते. त्यांचे हे काम आहे.
या त्रिवर्गानी सदरहूप्रमाणे लिहून पाठवून राजाचे तर्फेचे बोलणे व लिहिणे बंद केले. तेव्हा महाराज छत्रपतीनी इंग्रज लोकांचे मदतीने काही काम चालवू नये व बोलू नये व परस्परे कागदपत्र जाऊ येऊ नयेत, अशी अडचण होऊन नाईलाज जाहला याजकरिता महाराज छत्रपतीनी विचार करून दिलास आणले की, जे आपण प्रथम आरंभिले होते त्याअन्वये हल्ली वकील लंडणास पाठवावे आणि आपला कच्चा मजकूर तेथे इंग्रजी दरबारांत समजावून चांगला बंदोबस्त करून घ्यावा. सदरहू विषयीची खबर रेसिडंटास कळताच त्यानी आपले गव्हर्नमेंटास ता. २८ नवंबर सन १८३८ या रोजी ओवान्स यानी पत्र लिहून पाठवून जाहीर केले की, महाराजाची मसलत जाहाली आहे.
एक फ्रेंच मुंबईत आहे त्याच्या हवाली आपले वकील करून देऊन इंग्लिशस्थानांत रवाना करावे. त्या फ्रेंचाचे नाव डेलमूर हा या वकीलांस मुंबईहून विलायतेस जलमार्ग म्हणजे समुद्रातून जहाजातून नेणार. (पार्ल. पा. ४५०) आणखी पहा. फेब्रुवारी सन १८३९ सालाचे प्रारंभी वकील व चाकर दुभाषी सुद्धा असामी ८ हे सारे लोक मुंबईस आले होते. त्यानी या लंडणास येण्याबद्दल जहाजास भाडे साडेपाचशे पौंड म्हणजे साडेपांच हजार रुपये देऊन पावती घेऊन फ्रेंचांच्या तारवांतून निघोन येण्याची तयारी केली.
नंतर ही खबर समजताच मुंबई कौसलदार जमून आपआपली संमतपत्रे बहुत मेहनतीने तरकटी काम कसकसे प्रकारे चालविले. त्यापैकी थोडे थोडे दस्ताऐवजी हंसील धरून तुम्हास जाहीर करतो. पहा. पहा. या कित्येक कागदावर तारखा व सालें लिहिली नाहीत. आणखी ऐका हो. हे कौन्सलचे मंडळीचा मतलब एकच. परंतु खरेपणा दिसण्यास आपआपल्या खोल्यांत निरनिराळे बसून कृत्रिमी मतलब करून आपआपले अकलेचा शहाणपणा दाखविण्याबद्दल तरकटे नानाप्रकारची बनावून तजवीज केली आहे ती पहा. आणि जो मजकूर तुम्हास मी समजावितो तो तो सारा खरा. पार्लमेंटाचे कागदांतील हे दस्तऐवज आहेत. तुम्ही नजर ठेवून पहा.
मिनिट १ ली (१२-२-१८३९)-
"हिंदू माणसें सांगतात कीं आम्हीं सातारचे राजाचे हुकुमानी लंडणास जातो. त्यास या लोकांचे जाण्यास अडथळा करण्यास हे योग्य कारण आहे. येविषयी राजास विचारावे, तेथे चौकशी करावी. आणि राजानी वकील पाठविण्यास गव्हर्नमेंटाचा हुकुमहि जाहला नसता अशा रीतीने वकील लंडणास पाठवितात हें नीट नाही."
(सही). फेरीष, अॅक्टिंग गव्हर्नर.
मिनिट २ री (१२-२-१८३९) -
‘`सातारचे राजे वकील लंडणास पाठवितात. परंतु वकील गव्हर्नमेंटचे हुकुमाशिवाय रवाना करण्यास राजास अधिकार नाही. आणि कोणी असामी वकील लंडणास पाठविण्यास गव्हर्नमेंटाचा हुकुमहि जाहाला नाही. अथवा वकील पाठविण्यास केव्हांह हुकुम होणार नाही. परंतु ज्या कारणास्तव ही माणसे विलायतेस सातारचे हुकुमानी जातात, याजकरितां सदरहू मजकूर गव्हर्नमेंटास कळण्याकरितां त्यांची नावनिशी व त्यांच तर्फेचा मजकूर लिहून घेतला पाहिजे.`’
(सह्या) फेरीष, डनलॉप.
मिनिट ३ री (१३-२-१८३९)
"वकील लोकांबाबत मि. इलिएट मुख्य मैजिस्ट्रेट म्हणजे फौजदार यास या लोकाचा शोध करण्याविषयी सांगावे, आणि अॅडव्होकेट जनरल म्हणजे सुप्रीम कोर्टाचे मुख्य वकील यांस हा मजकूर समजावून त्यांच संमत घ्यावे की सातारचे राजे लडणास वकील पाठवितात. परंतु गव्हर्नमेंटातून या माणसांच्या जाण्यास अटकाव करण्याविषय कायद्यावरून गव्हर्नमेंटाचे हातांत जोर व कुदरत आहे किंवा नाही हे शोध करून समजवावें. मि. डेलमूर फ्रेंच यानी आपले खुषीप्रमाणे लंडणास जावे. त्यास आम्हाकडून रजा आहे. आणखी त्यांनी हिंदुस्थानांतून परत निघोन जावे. परंतु त्यानी गव्हर्नमेंटचे हुकुमांतील जागांस जाऊ नये व दुसरे कोणतेहि ठिकाणी जाऊ नये. परंतु जी खबर मिळाली त्यानंतर त्यास आम्ही सूचना केली आहे त्याप्रमाणे त्या जागांचे अमलदार त्यास जबाब विचारतील, अथवा दिलात चहातील तसे करतील."
(सही). फेरीष डनलॉप.
मिनिट ४ थी (बिन तारखेचे)-
अॅडव्हाकेट जनरल यानी तहनामा तपासून नीट चौकशी करून पहावा.
(सही) फेरीष.
मिनिट ५ वी (फेब्रुवारी १७):
"या माणसांस जाण्यास गव्हर्नमेंटातून रजा आहे. परंतु ही माणसे तेथे पोहोंचल्यावर त्याजबद्दल खर्च कंपनीचे अंगावर काही न पडावा. सबब त्याजपासून रोख रुपये घेऊन जामदारखान्यात ठेवावे. अॅडव्होकेट जनरल यास या माणसांबद्दल कायद्याचे संमताचे शोध करून लिहिण्याविषयी पेशजी लिहिले होते. परंतु त्याजकडून अद्यापि उत्तर आले नाही. आणि मॅजिस्ट्रेट यानी या दरएक असामीपासून जबान्या लिहून घेतल्या होत्या. त्या त्यानी आम्हाकडे पाठवाव्या अगर हुजुर आणून गुजराव्या."
(सह्या). फेरीष, डनलॉप.
यादी ता. २१ फेब्रुवारी मि. बॉइड अॅक्टिंग सेक्रेटरी याची-
"मी गव्हर्नमेंटास सूचनार्थ विनंति करितो ऐशी जे सरकारतून हुकुम जाहल्याप्रमाणे हिंदू आसामी यास मी पाहिले, आणि त्यांस जो मोकदम्याचा मजकूर जरूर विचारावयाचा होता तो त्यास विचारला आणि त्यानी जी उत्तरे केली ती लिहून घेऊन ते कागद या कागदाबरोबर गव्हर्नमेंटास मजकूर समजण्याबद्दल पाठविले आहेत. गव्हर्नर इन कौन्सिलचे नजरेत यावे की यशवंतराव हे महाराजांचे शरीरसंबंधी. असून या वकीलीच्या कामास मुख्य आहेत, ही दोन्हीहि कलमे या कामात मोठी उपयोगी आहेत तीच (ते) कबुलहि करितात. प्रथम चाकरीस ज्या कारणावरून लंडनास जातात तो मजकूर दुसरे वकीलीचे कामाबद्दल यास महाराजापासून खरा दस्ताऐवज याजपाशी आहे. आणि आपण मला सूचना केल्याप्रमाणे त्यास मी विचारले की तुम्ही कोणत्या जहाजावरून जाणार आहां.
आणखी त्यास सांगितले की तुमचे मजकुराविषयी सातारियात चौकशी करून तेथून लिहून येईतों पावेतों गव्हर्नमेटाचे हुकुमाशिवाय तुमचे जाणे बंदरा बाहेर होणार नाही. पुन्हा मी त्यांस सांगितले की तुमची सर्व चाल व रीत व स्थीत पुर्तपणे गव्हर्नमेंटास माहीत जाहली. ही बातमी समजली त्याजवरून व हल्ली हा मुद्दा कळल्यावरून आता तुमचा अहवाल असा आहे. त्यासमयी त्यांनी आम्हास उत्तर केले की, आम्ही जाणार. परंतु आमच्या जाण्यास नुस्ते तुमचे आटकावाचे मात्र आम्हास भय आहे."
मिनिट ६ वी (ता. २२ फेब्रुवारी)-
"कर्नल ओव्हन्स, रेसिदंट, सातारा याचे पत्र ता. १८ माहे मजकूराचे (पार्ल. पा ४५३) आणि मि. बॉइड सेक्रेटरी यानी जी चौकशी केली त्याचवरून पहाता सातारचा राजा आपले कामाबद्दल लंडणास वकील पाठविणार यांत काही संशय नाही, परंतु मि. बॉइड यांनी मुख्य असामीस सांगावे की तुम्ही मुंबई गव्हर्नमेटाचे हुकुमाशिवाय जाता. आणखी असे सांगावे की तुम्ही असे समजू नये की आम्ही राजाचे वकील होऊन लंडणास जातो. परंतु मुंबई गव्हर्नमेंटाचे पुरी खातरजमा आहे की. जरी तुम्ही तेथे गेला असता कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स व इंग्लिश म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट तुम्हास लंडणास राजाचे वकील म्हणून ओळखणार नाहीत. आणि तुमची वकीलीहि कबूल करणार नाहीत. हे तुम्ही पुर्ते उमजावे.
अॅडव्होकेट जनरल यास वकीलाचे जाणे कदाचित् कबूल नसलियास -- तत्रापि जो हा गव्हर्नमेंटानी या वकीलांविषयीचा ठराव केला आहे तो मजकूर त्यास कळवावा."
या सर्व कागदांच्या नकला गुप्त कमिटी ईस्ट इंडिया कंपनीचे डिरेक्टर्स याजकडे रवाना करून त्यांस लिहून कळवावे की आम्ही फार शिफारस करून हे लिहिले आहे तरी आपण तेथे मुक्रर ठरवावे की हे वकील ज्यावेळी लंडणास पोहोंचतील त्यासमयी तेथे कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स व ब्रिटीश गव्हर्नमेंटानी या लोकांस राजाचे वकील म्हणून ओळखू नयेत आणि यांच्या वकीलीचे कामहि कबूल करू नये, म्हणून आपण त्यांस विनंति करावी. आणखी असे हे वकील लंडणास जाण्यास येथील गव्हर्नमेंटाची रजा असावी किंवा नाही? आणि बिगर हुकुमानी या लोकांची तुम्हांकडे येण्यास तुमचा असा हुकुम आहे की काय? म्हणजे आमच्या लिहिण्याप्रमाणे गुप्त कमिटीहि आपले ठिकाणी पुर्तपणे विचार करून ठराव करितील आणि राजाचा तहनामाहि गव्हर्नमेंटासी जाहला आहे त्या अन्यये या मोकदम्याचे काम आहे किंवा नाही योजवर पुरी नजर ठेवावी.
(सही). फेरीप, अॅक्टिंग गव्हर्नर.
मिनिट ७ वी (ता. ११ मार्च)-
"मि. इलिएट मुख्य मॅजिस्ट्रेट यास हुकुम करावा की, या असामी गव्हर्नमेंटास रुजु कराव्या. परंतु मैजिस्ट्रेट यांनी आपले खुषीने प्रथम ही तजवीज केली असती तरी त्यांत याचा शहाणपणा होता. परंतु या असामी आपल्याशी रुजु होऊन ते कदाचित् आम्ही वकील आहो म्हणून बोलल्यास: परंतु त्यास राजाचे वकील तुम्ही आहां म्हणोन गव्हर्नमेंट ओळखणार नाही."
-फेरीष.
मिनिट ८ वी (बिन तारीख)-
"मि. इलिएट मुख्य मॅजिस्ट्रेट यानी जी सूचना केली ती कळली. परंतु याउपरी त्यांनी जी सूचना करणे ती नीट करीत जावी. त्या लोकांपासून लिहून घेऊन गव्हर्नमेंटास मजकूर समजाविला हे नीट केले नाही. तथापि यापुढे त्या मनुष्यांपासून मजकूर समजून घेऊन मुख जबानीनेच समजवावा. त्यांजपासून लिहून घेऊ नये. आणि कलेक्टर म्हणजे मामलेदार यास हे काम खास पाहणे जरूर आहे. सबब त्यांस सूचना करण्याचे जरूर कारण दिसत नाही. आणि या पत्राशिवाय आणखी बोलणे व लिहिणे दप्तरांत ठेवावे."
गव्हर्नर व कौन्सिलदार.
हे पत्र कोणते व कोठे आहे ते समजत नाही. आणि या कागदांत छापिले नाही. असे हे तरकटी गव्हर्नमेंटांचे काम आहे. पहा बरे.
मिनिट १ ली (बिन तारीख)-
"मि. डेलमूर यास आपले तर्फेनी काही सांगावयाचे नाही असे मला वाटते. परंतु हिंदी माणसे सातारचे वकील आहेत म्हणून ऐकतो. सबब त्यास आपण बहुत मजकूर सांगावयाचा आहे असे माझे चित्तांत वाटते. आणखी मी आजचे दिवसापूर्वी मिनिटीत मजकूर लिहून समजाविला आहे की या मनुष्याचे जाण्यास आडथळा आणि हरकत करावी असे मला वाटते."
(सही) अंडरसन.
पहा. या गृहस्थाची पूर्वीची मिनिट गुप्त दाबून ठेविली आणि या कागदांत छापिली नाही, हे कसे व कोणते अब्रुचे तरकटी काम? ते तुम्ही नजरेत आणा. पहा.
मिनिट २ री (बिन तारीख)-
मला वाटते की या असाम्याच्या जाण्यास अटकाव करावा. कारण हे गव्हर्नमेंटाचा हुकूम न घेता राजाच्या हुकुमानी वकील होऊन लंडणास जातात. सबब या जाणारांस हरकत करावी.
(सही) अंडरसन,
मिनिट ३ री (बिन तारीख)-
"तहनाम्यावरुन विचार करून पहाता आपले रजेशिवाय असे काम जाहाले असता मना होते की नाही? पहा. याच गोष्टीवरून पाहून सांगतो त्याजवरून ही मोठी गोष्ट नाही."
(सही) अंडरसन.
काम काज म्हणजे वकील लंडणास गव्हर्नमेंटाचे हुकुमाशिवाय सातारचे राजे पाठवितात; आणखी पहा. याच अंडरसन यानी या गोष्टीवरून पेशजी लिहिलेले ते पत्र या कागदांत कोठे छापिले नाही. पहा हे तरकट. हा दुसरा कागद गुप्त दाबून ठेविला आहे. आणि मी विचारतो हे गव्हर्नमेंटाचे कामगार लोक का बरे भीत होते? आणि असे चोरट्याप्रमाणे हे काम का बरे करीत होते? म्हणाल तरी पहा मुद्दा. हा मोकदमा समूळ खोटा. सबब असे प्रकारचे तरकटी काम केले. त्या ह्या अशा लोकांस कंपनी म्हणजे वाणी बनया यांचे गव्हर्नमेंट म्हणतात. हे पहा बरे.
मिनिट ४ थी (१८ फेब्रुवारी)-
"ही मनुषें सांगतात की आम्ही राजाचे वकील नव्हेंत म्हणतात. तेव्हा कदाचित याहून जर त्यांस राजानीहि कबूल जर केले नाही तरी या माणसांस अगदी आपण लबाड करू. तत्रापि राजाचे तर्फेनी हे तेथे मुक्रर खचित जाणार असे होऊन आल्यास नंतर या मोकदम्यांत हे लोक कदाचित जर जेर करूं लागले तरी माझें चित्तांत या असाम्यांस जाण्यास रजा दिली पाहिजे; कारण मुक्रर आणि खामांखा जरी या असाम्या राजापासूनहि तत्काल त्याग होतील, असेंहि यांतच कारण आहे."
(सह्या) अंडरसन व डनलॉप.
पहा! हे बारीक कर्मे छिद्रे धरून कशा कल्पना करीत होते.
मिनिट ५ वी (बिन तारीख)-
"शेवटची जी पत्रे गुप्त ज्या वाटेनी घेतली त्याजवरून पाहता या वकील असाम्यांचा स्वतःचा मनसुबा विलायतेस जाण्याचा होता. परंतु हल्ली असे जाहल्यावरून आता ही माणसें जातील असे दिसत नाही. असे जाहाले म्हणजे जहाज गेले. यैवजहि बुडविला."
(सही) अंडरसन.
हे कृत्रिम करून मोठे खूप हे ग्रहस्थ जाहाले.
मिनिट ६ वी (बिन तारीख)-
"हें काम युक्तीने नीट पाहून चरें चांगले केले नाही असे मला वाटते. परंतु हल्ली पहाता सारे होऊन गेलें."
(सही) अंडरसन,
पहा या ग्रहस्थाची यांतून चांगली युक्ती कोणती होती? तरी यातून मोठे तरकट कसे करावे चाहत होते. तुम्ही पहा हो, ही मुंबई गव्हर्नर इन कौन्सिलची संगतपत्रे दूर आसामीवार त्यांनी लिहिलेलीच आहेत. परंतु पहा. तुटकी व तुकडे! यांत बहुत करून बिन तारिख आणि गुप्त रहावी, चौकशीत न यावी. हे महा. मुळापासून अंधारांत छपवून ठेवण्याच्या युक्ति कृत्रिमेंकरून लिहिली. ही कारणे पहा, हो. सत्य लपवून दडवून ठेवण्याची कोणती सबब म्हणाल तरी हे खोटें जनजाहीर आहे; या लोकांच्या लिहिण्यावरून हें साफ प्रगट जाहले आहे कीं असें हे काम रोजबेरोज सहा आठवडे पावेतों मुंबई गव्हर्नमेंटचे कौन्सिलच्या कोठड्यांत बसून काय काय प्रयत्न करून कोणते. प्रकारचे काम चालवीत होते. आणखी पहा माझे चित्तांत जे जे मजकूर मी तुम्हांस सांगितले ते सारे सत्य खरे आहेत. पहा बजिनस ही दरएक असामीच्याच स्वदस्तुरचीच अक्षरें दर अक्षरें जें खरे तेच मी तुम्हांस समजावितो.
पहा, राजानी वकील या लंडणास पाठविण्याचे काम केले, हा मोठा दोष केला की काय? आणि असा हा गुन्हा माफहि नाही! गव्हर्नमेंटानी सदरहू प्रमाणे कर्मे केली. बेदाद जाहाली, त्याजवरून राजानी आपले वकील लंडणास पाठवून आपला मजकूर समजावून बंदोबस्त करून घेण्याबद्दल मुंबई गव्हर्नमेंटावर फिर्याद करावी हेच काम राजानी केल्यावरून फार दोष केला की काय? तो तरी सांगा बरे. आणखी पहा, राजानी वकील लंडणास रवाना केले. त्याजवरून मुंबई गव्हर्नमेंटास असे वाटले की हे काम महान पातकाचे आणि मोठ्या गुन्ह्याचे राजानी केले. आणखी ऐका. या गव्हर्नमेंटाचा जोर व युक्ती व कृत्रिमे व मनोत्साह मुख्य मिळून राजाचे कामास अपाय करणे, नाना प्रकारच्या इजा दिल्या, तो मजकूर मी तुम्हांस सांगतो तो नजरेंत आणा. मी तुम्हांस विचारतों या लंडणांत या गव्हर्नमेंटाचे धनी किंवा चाकर आहेत? ते सांगा बरे. आणखी पहा.
मुख्य मॅजिस्ट्रेट कंपनीचे नौकर, त्याचे हुकुमतींतील लोक व अॅडव्होकेट जनरल हे इंग्रजी लॉयर म्हणजे मुख्य सुप्रीम कोर्टाचे वकील आणि हे मुंबई गव्हर्नमेंटास यथान्याय करून सला देणार. पहा त्याची याद व सेक्रेटरी व अॅक्टिंग सेक्रेटरी हे कंपनीचे नौकर गव्हर्नमेंटास उपदेश करून खुणेने दाखवून अशी जी सूचनापत्रे गुप्त दाबून ठेवणार. हे कोण लोक म्हणाल? तरी समुद्राचे बोट बंदरचे महसुलदार, कंपनीचे नौकर ह्यांच्या ह्या तरकटी कृती तुम्ही पहा, उपदेश व खास सूचना. या कामास अंगी भाक नाहीसे दिसावे. परंतु हे संकेत कसे ते पहा. सर्व गलबला व गर्दी व कृत्रिमे व दगेबाजी व खोटे. अशा अनेक प्रकारच्या हिकमती करून हर तऱ्हेनी राजाचे वकील लंडणास जातात. त्यास हरकती अटकाव करून जाऊ देऊ नयेत.
ऐका हो. हाच या कंपनीचे नौकराचा मनोभाव बजिनस पाहा बरें. ह्या मिनिटा व त्यातच गुणा खोचा व गुप्त प्रकारचे किती तजविजीचे मजकूर ते तुटके व आफैँ आफैँ धरतोड करून लिहिणें व त्यातच मतलबा कपटी खाचा. अशा प्रकारची ही लिहिणी आहेत. सबब हा मजकूर तुमचे समजुतीत लवकर यावयाचा नाही. हें सत्य अगर मिथ्य तें तुम्हीं प्रत्यक्ष पहा, आपआपल्यात इषारे व बनवण्या खुणा व खोचा करून मतलब साधणे, हे कृत्य दुसऱ्याच्या अगर तुमच्या कोणाच्या कल्पनेत न यावे असेच मजकूर या कित्येक कागदात आहेत. अशी कृत्रिमी कामे करण्याचे कारण काय म्हणाल? तरी हे दुष्ट घातकी लोक—इंग्रजी कंपनी सह्याद्रीचे बंदरचे जकातदार अथवा मामलेदार हे आपले धन्यापाशी काय मागत होते व या लोकांची काय इच्छा होती? हे नौकर अगर कौन्सिलदार वगैरे यांच्या मनात आल्याप्रमाणे हे खोटे तरकट छपविण्याबद्दल ह्या बनावण्या केल्या. परंतु त्याच्या दस्ताऐवजी कृती धरून हल्ली मी बजिनस तुम्हास दाखवून प्रसिद्धपणे या प्रांती सर्वत्र जनास जाहीर करीत आहे.
वकीलाचे जाण्याचा मजकूर सातारियाहून ओव्हन्स रेसिदंटानी आपले मुंबई गव्हर्नमेंटास खबर देताच विलंब न करिता वकील मुंबईस येण्यापूर्वीच ती इलिएट मॅजिस्ट्रेट यास गव्हर्नमेंटानी सूचना केली आणि त्यास हुकूम देऊन पुर्तेपणे त्यास सांगितले की, या दरएक असामीपासून त्याच्या मजकुराच्या जबान्या लिहून घेऊन रुजु कराव्या. कारण या आसामी लंडणास जाणार असे वाटले. सबब त्यांची नावनिशी व कोणती बाबत व काय सबब सांगतात हे तपशीलवार लिहून घेऊन गव्हर्नमेंटास कळवावे. पहा बरे, मैजिस्ट्रेट यानी या गैरमाहित असाम्या आल्या त्यास कैदेत ठेवून तजवीज केली ती पहा!
जसा कोणी चोर अगर गुन्हेगार असतो त्याप्रमाणे ही गरिब घरून आणून त्या दरएक असामीपासून वेगळ्या वेगळ्या पासून सवाल करून जबाब लिहून घेतले! परंतु पहा मुद्दा यानी असें काम सुरू करण्यांत व ज़रब दाखविण्यांत या माणसानी जिवाच्या बचावाच्या पुढे भ्यावें आणि राजाचे चाकर आम्ही आहों म्हणून कबूल करूं नये.
आणखी यानी वकिलीचे काम सोडून द्यावें म्हणोन या गव्हर्नमेंटानी दुष्ट बुद्धीनें असा मतलब केला. तुम्हीं नजरेंत आणा. मि. अंडरसन म्हणतो की हे जर असे कबूल होऊन मुक्रर करतील तर लोकांस परत जाण्यास रजा दिली पाहिजे. परंतु जर साताऱ्याच्या राजाचे तर्फेनी जातील तर मला वाटते की त्या माणसांस आपण हरकत अटकाव करून जाऊ देऊ नयेत. मि. फेरीष-कंपनीचे गव्हर्नर म्हणतो की हे सातारचे राजाचे हुकुमानी जातो म्हणतात. परंतु कोणी असामी वकील करून लंडणास पाठविण्यास गव्हर्नमेंटाचा हुकूम राजास जाहाला नाही. आणि हुकुमहि होणार नाही.
सबब येविषयींचा मजकूर सातारचे राजास विचारून चौकशी होऊन येईतोपावेतों या कशी तजवीज केली ती. परंतु असे करण्याचे कारण काय म्हणाल? तरी या लोकांनी भ्याचे, काम सोडून द्यावे. खोटें तरकट केले हें लंडणास कळू देऊ नये. हाच मतलब त्यांचे चित्तात होता. परंतु वकील न भीता चालले, तेव्हां गव्हर्नमेंटचे करणे रद्द जाहले. आणखी पहा, आक्टींग सेक्रेटरी यांनी खबर दिली की मी त्यास जरूर मोकदम्याचा मजकूर विचारला तेव्हा त्या असाम्यास मी सांगितले की तुमची चाल व रीत व स्थित पुर्तेपणे गव्हर्नमेंटास माहित जाहाली.
येविषयीं बातमी व पाळत ठेविली आहे. त्यासमयी त्यांनी उत्तर केले की आमच्या जाण्यास नुसते तुमचे अटकावाचे मात्र भय आहे. आणखी पहा. मॅजिस्ट्रेट यास सांगितले की, तुम्ही यांजपासून ठेव ऐवज ठेवून घेणे. याप्रमाणे तुम्हास पूर्वी मजकूर सांगितला तो तुम्ही ऐकला आहे. पाहा. या गव्हर्नमेंटाचे मनातून आम्हीं या लोकापाशी नौकर माणसाबद्दल ऐवज मागितला असतां त्यांस ऐवज देण्यास मिळणार नाही. तेव्हां हे आपण होऊनच थकून जाण्याचे राहातील असे या गव्हर्नमेंटचे खचित मनांत आले. परंतु या गव्हर्नमेंटाचे म्हणण्याप्रमाणे ऐवज आणून मुंबई गव्हर्नमेंटचे खजिन्यांत दिला. ते समय माजिस्ट्रेट यास या गव्हर्नराचा हुकुम जाहाला कीं, हे वकील गव्हर्नमेंटास रुजु करावे. परंतु मी समजावितों तुम्ही चित्तांत आणा की या फेरीष गव्हर्नर याचे एकाच मिनिटांत दाखवितो की हे सातारचे राजाचे वकील होऊन आल्यास आम्ही त्यास ओळखणार नाही.
पहा, पहा हो, हेच मशारनिल्हे हल्ली या मिनिटांत लिहितात की हे वकील आम्हांस रुजु करावे. हे मोठे आश्चर्य आहे! पहा या ग्रहस्थांचे बोलणें व लिहिणें कोणते कायम धरावे? तें कसें अब्रूचे काम? हे तुम्हींच नजरेंत आणा. आणखीहि ऐका हो. मॅजिस्ट्रेटहि गव्हर्नमेंटचे हुकुमाप्रमाणे रुजु करितो. ते कसें म्हणाल? तरी वकीलापाशी लिहून घेऊन जबान्या देतो. त्यास हेच फेरीष म्हणतात की मि. इलिएट मॅजिस्ट्रेट यानी त्याजपाशी लिहून न घेतां मुख जबानीनें नीट मजकूर समजून घेऊन सूचना करावी. परंतु पहा. माजिस्ट्रेटास व दुसरे कामगारास याच गव्हर्नमेंटाचा खचित हुकम जाहाला की वकीलाचे मुखातून जे हरएक शब्द निघतील ते दरोबस्त लिहून घेऊन हे कागद गव्हर्नमेंटास द्यावे. परंतु त्याजपासून हे शब्द दर शब्द लिहून घ्याल ते त्या वकीलास बिलकूल कळू देऊ नये.
आणखी ऐका. अॅडव्होकेट जनरल यास या वकीलांवर चित्त्याप्रमाणे सोडून दिले. यांतील कारण पहा. या ग्रहस्थानी मोठा राग करून जरब व भय घालून क्रोधानी बोलावे. धमकी व गुरकी भयंकरपणा जोरानी दाखवून या वकीलांनी हे वकीलीचे काम सोडावे, भयभीत होऊन म्हणावे की आम्ही या वकीलीचे कामावर जात नाही, असेच म्हणावे, हेच मुख्य काम. यांत दुसरा मतलब कोणता होता सांगा बरे? गव्हर्नर म्हणतो हे सातारचे राजाचे तर्फेनी लंडणास जातात ही खबर आम्हांस मिळाली आहे. याजकरिता अॅडव्होकेट जनरल यानी तहनामा नीट पहावा आणि या लोकांच्या जाण्यास हरकत करण्यास गव्हर्नमेंटाचे हाती जोर आहे किंवा नाही म्हणून संमत घ्यावे. पहा. अंडरसन म्हणतो की, तहनाम्यावरून पहाता सातारचे राजांनी असे काम गव्हर्नमेंटाचे हुकूमाशिवाय केले असता मना होते की नाही. पहा हो. हे कंपनीचे चाकराची चाल रीत व स्थित व काम करण्याची शिस्त व कपट बुद्धी व तरकट करण्याची युक्ती कसे प्रकारची, हे सर्वत्र सभा मंडळीस मी अर्ज करून समजावितो.
हा मजकूर तुम्ही ऐका हो. पुर्तेपणे लक्षांत आणा. या चाकरांचा धनी हजर नसता धण्याच्या नावानी दुसरे मनुष्याशी करारनामे व तहनाम व ठराव वगैरे करण्यास आज्ञा मागतात असा शिरस्ता व चाल आहे. परंतु ऐका हो, तसे हे नाही. हेच चाकर आपण स्वतः करार, ठराव तह प्रथम करून जनास प्रकट करितात. तेव्हा मोठे आर्जव व खरेपणा दाखवून नम्रतेन गोडीगुलबाई करून दस्ताऐवजी गुंतवून घेतात, आणि पुन्हा चमत्कार पहा! ऐका हो. तेच चाकर आपले करार ठराव व दस्ताऐवजावर लक्ष न ठेवितां तह तोडितात आणि राजांनी तह तोडिला म्हणतात. परंतु पहा हे कंपनीचे चाकरांचे काम. ज्या मनुष्यादर जुलुम केला व दुःख दिले व खोटी तरकटे उभी केली अशी दृष्ट कामे कराराचा धणी बहुत दूर इंग्लंड येथें आहे त्याजकडे वकील पाठवून फिर्याद या लोकादर करणें प्राप्त जाहाली.
सबब याच कारणावरून तुफान रचून तहनामा तोडिला म्हणून निमित्य ठेवणारे तेच लोक. आणि त्याच लोकांनी खोटें तरकट करून आणि तेच फिर्यादीस जबरदस्तीनें अटकाव करून वकीलांस धरतात, मी विचारतो कंपनीचे चाकराचा मजकूर जर खरा होता तरी या फिर्यादीस का भीत होते? परंतु ऐका, ऐका हो. या कंपनीच्या चाकरानी खोटें तरकट करून समजून उमजून राजास बुडविण्याबद्दल केलें. तेव्हा या तरकटी कामाचा लंडणांत बोभाट जाहाला असतां आपली अन जाईल आणि जन होसेल म्हणून अशी तजवीज केली. परंतु माझा हा बजिनस कंपनीचे चाकरांवर या तरकटाचा खास हा दस्ताऐवजी मुद्दा आहे. हें खरें किंवा खोटें हें तुम्ही नजरेंत आणून सत्य असेल ते सांगा बरें?
मि. फेरीष-कंपनी वाणी म्हणजे यांचे चाकर गव्हर्नर यांनी कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स ईस्ट इंडिया कंपनीच्या गुप्त कमिटीस अर्ज लिहिला की, सातारचे राजांनी लंडणास वकील रवाना करण्यास गव्हर्नमेंटाचा हुकूम असावा किंवा नाही? म्हणोन पहिल्या पेक्षा अधिक जोरांनी म्हणतात. पहा हे दुष्ट पातकी निर्दय व मूर्ख व अधर्मी तरकी कामे करणार अशा अकलेचेच लोक गव्हर्नमेंटांत आहत! आणखी पहा हे काम दडवून गुप्त आंधारांत ठेवण्याबद्दल अशा कृती केल्या. परंतु ज्यांच्या धण्यास अशी इजा केली ते कसे उगीच राहतील? त्या पेक्षा असे कृत्रिमी मजकूर गुप्त न राहता व ईश्वरास हें न साहतां तत्काल जनजाहीर होऊन मोठी फजिती होईल. हें का बरें त्या लोकांनी दिलांत आणिलें नाही? आणि हें सदीच्या जोरांनीं केलें. परंतु येथे कोठें आहे तो जोर? हल्ली हा अगदी गव्हर्नर आणि गरीब माणूस सारखे. (टाळ्या हियर हियर) आणखी सांगतो पहा.
हिंदुस्थानात मनुष्ये सुमारे पंधरा कोटी आहेत. त्या सर्व मनुष्यांची तोंडे बांधून त्यांच्या कानांत बोळे घालून बहिऱ्या व मुक्या व आंधळ्याप्रमाणे करून ठेवावी, आणि त्यांस या मुलुखांतील काही मजकूर, रीत, स्थिती, चाल, चलन, कळू देऊ नये. जोरानीं धमकावून दाबून गुप्त ठेवण्याविषयीं या मुंबई गव्हर्नमेंटांची मोठी इच्छा आहे. ऐका हो. आणखी मी या फेरीष कंपनीचे गव्हर्नरास साफ विचारतों की ही पंधरा कोटी मनुष्यें हिंदुस्थानात आहेत, त्यांस या फेरीष गव्हर्नराचे धणी कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स यांचे ते लोक सारे माल मिळकत सुद्धा बंदे गुलाम आहेत की काय? किंवा पहा बरें, जसे तुम्ही लोक `फ्री` म्हणजे आपमुखत्यार आहा, त्याप्रमाणे तेही लोक आपमुखत्यार आहेत.
आणखी पहा, तुम्ही लंडनचे पातशाहाजादीचे हुकुमाखाली आपमुखत्यार तसेच ते लोक आहेत किंवा कसे तुम्ही सांगा बरे? परंतु असो, हे कंपनीचे नौकर कसकसे प्रकारें तजवीज करून त्या मनुष्यांवर हुकुम चालवितात तो हुकूम व तरकटें अशा प्रकारची बहुत आहेत.
अॅडव्होकेट जनरल यानी वकीलास फार वेळा बहुतप्रकारें मतलब करून तैडेबाके कसोशीनें विचारलें. परंतु त्यांत प्रकारें त्यांचा मतलब साधला नाही. आणखीहि ऐका हो. गव्हर्नमेंटानी अॅडव्होकेट जनरल यास तहनामा पहाण्यास सांगता या गव्हर्नमेंटातून या लोकांचे जाण्यास अटकाव करण्यामाफक कायद्यावरून गव्हर्नमेंटास जोर व कुदरत आहे किंवा नाहीं म्हणोन सला विचारली. त्याजवरून अॅडव्होकेट जनरल यानी या गव्हर्नमेंटास सांगितले की तहनाम्यावरून विचार करून पहाता लंडणास या लोकांच्या जाण्यास तुमचेनी त्यास अडवून हरकत करवत नाही.
आणखी सातारच्या राजानी दकील लंडणास पाठविले असता तहनामा तुटत नाही. तेव्हा मुंबई गव्हर्नमेंटाचा उपाय थकून दिलगिर जाहाले. परंतु पहा या समुद्राच्या बोट बंदराचे महसूलदार नौकराच्या नौकरांनी ह्या लंडणास वकीलांचे येण्यास हरकत करण्याबद्दल मोठ्या प्रयत्न व बहुत मेहनतीनें चित्तापासून ही तजबीज केली. परंतु ती सारी तजवीज पोरखेळाप्रमाणे होऊन हल्ली पहातां मोठी फजिति होऊन जनास हंसे जाहाले.
फेरीष कंपनीचे गव्हर्नर तजवीज बनावून अर्थ स्वार्थपर सांगतात की कलेक्टर यास खास सूचना करण्याची जरूर नाही. म्हणजे काही मजकूर लिहिण्यांत येऊ नये. पहा हे फेरीषचे काम. कलेक्टर यास भरवश्यानीं गुप्त रीतीनें सांगून या कलेक्टर यांच्या हातीं सूत्र देऊन कळसूत्रे नाचविण्याप्रमाणे तमाशासारखी ती तजवीज केली ती पहा. फ्रेंच याचे जाहजाचे धण्यानीं मुंबई बंदरातून हे जहाज नेण्याबद्दल पासेंजर व खलाशी लोक सुद्धां टीप दाखवून या कलेक्टर याजपाशीं रजा मागितली. तेव्हां कलेक्टर यानी या जहाजाचे टिपीत वकिलांची नावे पाहून जाण्यास रजा दिली नाही. परंतु पहा. सातारचे राजाचे वकीलानी या जहाजाचे भाडे साडेपांच हजार रुपये देऊन येण्याचा करार ठरला असतां या जहाजाचे कप्तान यास कलेक्टर यानी जातीने वारंवार सांगितलें कीं तुमचें जहाजावर जोंपावितों वकील आहेत तोपर्यंत तुम्हांस जाण्यास हुकूम होणार नाही आणि रहदारीचे दस्तकही मी तुम्हांस देणार नाही.
आणखी पहा कप्तान व अमलदार व खलाशा व जहाजावरील माल या विषयी काही संशय अथवा हरकत कलेक्टर याजकडून नव्हती. जहाजवाल्यानी इंग्रजी बंदरचे शिरस्तेप्रमाणें तजवीजी बंदोबस्त करून कबुलकरार जाण्याविषयीं जाहाला होता. परंतु या जहाजावर काही गैर रीतीची वस्तु आहे असें मुंबई गव्हर्नमेंटाचे दिलात येऊन हे जहाज जाण्यास हरकत केली होती आणि कप्तानानीं जाण्याबद्दल रजा मिळविण्याविषयीं प्रयत्न तितका केला. परंतु, गव्हर्नमेंटांनी हे जहाज हिंदूस्थानाचे बंदराबाहेर अगदी जाऊ देऊ नये असा पक्का बंदोबस्त करून हुकुम दिला नाही. परंतु या जाहाजावर ही कोणती वस्तू अगर जिन्नस होती तुम्ही म्हणाल? तरी ती ही वस्तू पहा बरें. ऐका हो गाजी जन्मकथा याच जहाजावर सातारचे राजाचेहि हिंदू वकोल होते.
तेव्हा या फँन जहाजाच्या घण्यांनी या वकीलास जहाजात न घेता टाकल्याशिवाय दुसरी लोड नाही त्याचा उपाय थकला. सबब वकीलास सोडून देऊन आपले जहाज त्या बंदरातून घेऊन निघोन गेले. परंतु पहा हो. या जहाजास पासेंजरास नोर विलायती पौंड ५५० दर पौंडास १० रुपये प्रमाण येकूण रुपये साडेपाच हजार दिले ते बुडाले. आणखी यहां ऐका हो. सदरहू जहाजास भाड्याचा ऐवज दिला हा मजकूर मुंबई गव्हर्नमेंटास पुरा माहीत होता. आता मी पुन्हा साफ विनंति करितो याजवर तुम्ही कृपा करून नजर ठेवून लक्षात आणावे. आणि हे ऐका हो बरे, आफ्रिकेचे हबशी लोक याचे जन्मापासून उत्पन्न होण्यासमयापासून ते बंदे गुलाम लोक आहेत म्हणतात.
ऐका ऐका हो. तेच हबशी लोक या इंगलीष प्राती येऊन या जमिनीवर जहाजातून उतरून पाय ठेविताच त्याची सांखळी आपोआप तुटून जाऊन ते सारे वाऱ्याप्रमाणे होऊन त्याची सुटका तुमचे हाते तात्काल होऊन गुलाम नावापासून ते सारे मुक्त होतात आणि न्यायनीतीने पहाता ते ईश्वराशिवाय दुसन्या धण्यास ओळखीत नाहीत व मानीत नाहीत.
पहा बरे हिंदुस्थानातील सर्व मनुष्य जन्मापासून आमरणति आपमुखत्यारीने प्रमुख असता त्याजवर कंपनीचे चाकर फार अनीतीने मोठा जुलूम करितात; त्याजवरून ती मनुष्ये आपला देश व वतन सोडून या लोकांवर फिर्याद करण्यास तिकडून या मुलखीं हजारों मैलावर महान संकटसमयी येतात, परंतु पहा. इकडे येणाराची कशी दशा व किती. दुःख देऊन कशी व्यवस्था या कंपनीचे चाकरानी केली तीच ऐका हो. जशी कोणी जंगालात जनावरांची शिकार करितात आणि ते जनावर भयामुळे तपटून जातें, जागजागी लपत फिरते, परंतु पुन्हा टेहळ ठेवून पत्ता लावून त्या जनावराचे पाठी लागतात, त्याप्रमाणे वकीलाचे मार्गे चोरपाळती ठेविल्या. नानाप्रकारच्या तजविजी करून शोध काढिले. नये घातली. अखेर कैद केले. शेवटी फार मोठा दंड घेतला. याचे कारण काय म्हणाल तरी अदल इन्साफाचा रस्ता बंद करण्याबद्दल अशी ही तरकटे केली. आणखी पहा. हे न्यायनीतिचे खरे काम इन्साफ मागण्याबद्दल येत असता त्यास पेंच दर पेंच घालून त्या मनुष्यास साखळीने आपले स्वदेशीचे जमिनीस मजबुदीने खूप बांधून ठेवावे, त्या मनुष्यांनी कोठे जाऊ येऊ नये, म्हणून सदरील लिहिल्याप्रमाणे कंपनीचे चाकरांनी असे काम केले. ते हल्ली तुम्ही नजरेत आणा.
असा मोठा ऐवज वकीलापासी दंडाप्रमाणे घेऊन इकडे येण्यास हरकत केली. नंतर वकीलांनी लंडणास येण्याबद्दल दुसरे इंग्रजी जहाज लिव्हरपूलचे बंदरास येणारे त्यास नोर देऊन इकडे निघण्याची तयारी केली. परंतु ऐका हो. हे इंग्रजी जहाज बंदरातून निघण्याबद्दल रहदारीचे दस्तक जहाजाचे कप्तानानी घेते समयी टिपेंत नावे वकीलांची होती, परंतु या कंपनीचे चाकरांनी या जहाजास अटकाव करण्यास मुंबई गव्हर्नमेंटचे हाती जोर नाही, तेव्हा या जहाजावरून वकील मुंबईहून अखेर शेवटी लंडणास आले. त्यासमयी वकीलाचे मनात आले की आम्ही मोठ्या शरतीने या मुक्कामी येऊन पावलो. आम्हावर मोठा जुलूम करून इजा फार जाहाली ती सारी आता शेवटास गेली; जेव्हा वकील या मुक्कामास पावले तेव्हा मोठ्या संतोपानी इंडिया हीसांत जाऊन इन्साफ मागण्याबद्दल कोटास रुजू जाहाले. परंतु पहा हो, ईस्ट इंडिया कंपनीचे डिरेक्टर्स पास पेशजी फेरीष अॅक्टिंग गव्हरनर व मुंबई कौन्सिलदारांनी लिहून पाठविले त्याप्रमाणेच कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स यानी शिस्त ठेवून या वकीलास ओळखले नाही, का आला?
तुमचा मजकूर काय आहे? हे अगदी न विचारता विकार केला, परंतु वकील काय भागत होते ते तरी पहा बरें. आम्हांस इन्साफ द्यावा, हेच मागत होते. असे असतो. कोर्टानी बेदाद करून मनात काही आणिले नाही. आणि सांगितले की, तुम्ही जेवून आला तेथे परत निघोन जाये. आणखी महा. ऐका हो. हे लोक ईस्ट इंडिया कंपनी (चे) प्रोप्रायटर यांच्या व्होटानी म्हणजे संगतानी ज्यावेळी हे प्रथम डिरेक्टर्स होऊन येतात. तेव्हा या दरएक दरएक असामीनी आपले क्रिस्टियन मुख्य धर्मशास्त्राचे युक म्हणजे जे गीतेप्रमाणे हे हातात घेऊन साक्षीनिशी सर्वांसमक्ष ईश्वराची शपथक्रिया करून सत्य स्वमुखानी सांगतात की, आम्ही आपले अदल न्यायनीतीचे कायद्याप्रमाणे सर्व मनुष्याशी बराबर पाहून निस्पृह व काही लोभ न करता साफ निरंतन खरेपणानी चालू, तरच आमचे ईश्वर संरक्षण करील.
या अन्वये बोलून शपथ घेऊन क्रिया करून हे डिरेक्टर्स होऊन नंतर या कोर्टाचे कामगार होतात. पहा ऐका हो, तुम्ही सर्वत्र मंडळी क्रिस्टियन आहा. त्यास तुम्हास या लोकांपैकी कित्येकांच्या क्रिया शफथा तुम्हास साफ आता मी खोटे करून दाखवितो. मी विचारतो अशी क्रिया करून नंतर खोटे काम करावे असे तुमच्या धर्मांत आहे? (नाही. नाही.) हिंदू अगर मुसलमान धर्मात आहे? (नाही, असे काम करणारे मूर्ख आहेत.)
पहा या कोर्टाचे हुकुमावरून वकील मोठे दंग होऊन आश्चर्य वाटून वकील काही दिवस येथे राहून पुन्हा इन्साफ देण्याविषयी कोर्टास विनंति केली ती व्यर्थ जाहाली, पहा हो या भूमीवर कोणी माणूस उपाशी असतो. त्याप्रमाणे या लंडनभर शहरात होऊन लाचारीने सारे वकील परत निघोन हिंदूस्थानात गेले. परंतु त्यातून नुस्ता एकटा मी येथे राहिलो आणि बहुत दिवस सहा वर्षे कष्ट मेहनत व दुःख व मोठी संकटे जाहली, ती सोसून या मुक्कामी राहून मोठ्या काराग्रहाचे दिवस काढिले आणि यत्न प्रयत्न हर प्रकारचे करून नम्रतेनी बहुत मानमान्यता देऊन या कोर्टास विनंति केली ती सारी निर्फळ जाहाली, सबब हल्ली तुम्हास मी विनंति करितो की, माझा मजकूर सर्वत्रानी कृपा करून श्रवण मनन करावे. आणखी मी निश्चयरूप समजावितो की जे जे मजकूर पूर्वी सांगितले त्यास तुमचेपाशी येण्यास जी जी मी दुःखे भोगिली ती सर्व ध्यानात आणा. आणखी ही मला पुर्ती खातरजमा आहे, की मी जे जे मजकूर समजाविले व पुढे सांगीन, ते ते सारे खरे बरहक आणि अदल न्याय पहाण्याचेच काम आहे. यांत काही वाकडे अगर पातकाचे कांहीच काम नाही.
इस्ट इंडिया कंपनीचे डिरेक्टर्स यानी माझे छत्रपति सातारचे राजे यास पत्र व तरवार पाठविली ती मुंबईस येऊन पावली. म्हणून राजास खबर मात्र कळली. परंतु ही बहुमानाची निशाणी कोर्टाचे यादगिरीची आली असता मुंबई गव्हर्नमेंटानी दिली नाही. पहा. पेशजी जहागिरदाराविषयी कोर्टानी महाराज छत्रपतीस पत्र पाठविले ते मुंबई गव्हर्नमेटाने प्रथम महाराजास न देता छपवून ठेविले. त्याचप्रमाणे ही तरवार व पत्र दिले नाही. गुप्त ठेविले. आणखी पहा जसे कोणी एखाद्या माणसास खुणेनी बोट दाखवितात. त्या अन्वये कृत्रिमी मतलब करून हा सातारचा राजा इंग्लीश गव्हर्नमेंटाचा. मोठा दुष्मान आहे म्हणून समजावून मोठा पुकारा करून सर्व जनास दाखविले. परंतु हा मजकूर राजे यास काही माहित नाही. जे जे मुंबई गव्हर्नमेंटाचे मनांत आले त्याप्रमाणे तरकटी खोटी कामे केली आणि पुढे आणखी तरकटे करण्यास तयार आहेत.
असे अनेक प्रकारचे दगे व कृत्रिमी काम करण्यास विलंब दुष्ट लोकांनी केला नाही. परंतु हे मजकूर इंग्रजी मुलखात सांगणे व मुंबई गव्हर्नमेटाची दगलबाजीचे कामे समजावणे म्हणजे बालकाची चोरी आणि बुक्याचा मार त्याचप्रमाणेच हे आहे. अशा बेवकूब साक्षीवरून बदनाम करणे. परंतु अशा या कामावरून आपला घरचा कुतराहि कोणी फांशी देणार नाही, म्हणोन जनरल रॉबर्टसन जनरल कोर्टात बोलले. हे पेशजी सातारचे दरबारांत रेसिदंट होते.
एक ब्राम्हण, त्याचे नांव सर्वत्रास माहित आहे. या बालाजीपंत नातूस गव्हर्नमेंट सांगील ते करावयास त्वरीत सिद्ध आहे. आणखी हा माणूस आपले दिलापासून हरएक तरकटी कामे करण्यास निरंतर गव्हर्नमेंटचे हुकुमास हजर आहे. पहा याचे स्वज्ञातीचाच जो पूर्वीचा याचा धनी पेशवे—मुख्य प्रधान बाजीराव रघूनाथ-यासी दगेबाजी करून बुडविला. या कामाबद्दल मुंबई गव्हर्नमेंटानी यास मानमरातब अब्रू देवून इनाम व बक्षीस पेन्सन सह दिले. हाच निमकहराम खोटा दगलबाज, याचे मनात असे होते की आपण सातारचे राजाचे मुख्य दिवाण व्हावे. आणि महाराज छत्रपतीपाशी या नातूनी दिवाणगिरी मागितली.
परंतु नातूस दिवाणगिरी दिली नाही व याजपासून चाकरी घेणें हेहि कबूल केले नाही. त्याजवरून महाराज छत्रपति विषयी या नातूचे चितात मोठा राग येऊन फार द्वेषाची तरकटी खोल खोल कामे केली. आणखी ऐका. हा दुष्मानी करण्यास कधी विसरावयाचा नाही, असे प्रसिद्ध असता यासच या तरकटाची सरदारी मुंबई गव्हर्नमेंटानी दिली. परंतु पहा महाराज छत्रपति सत्य आणि पुण्यवान् महान समर्थ कीर्तिमान् पुरुष जगप्रख्यात असता, हा नातू दुष्ट घातकी दुराग्रही यानी ही सारी कामे द्वेषांनी केली.
पहा. हे तरकट करणारे दुष्ट मनुष्यांचा जमाव करून नातू दगलबाज हे मुख्त्यार करून या नातूनी चहाड्याचुगल्या सांगून ज्या ज्या कल्पना चित्तांत योजून समजावीत गेला ते ते ऐकोन घेऊन हे मुंबई गव्हर्नमेंटानी तरकटास मदत करून या लबाड व खोटे तरकटी लोकास लाच रुपये इनामे बक्षिसे दिल्ही. परंतु हे देण्यास मुंबई गव्हर्नमेंट किती धर्म नितिने उदार किंवा अनीतीने हे किती तरकटी मूर्ख उदार ते तुम्ही पहा. प्रथम महाराज छत्रपती सातारा याजवर खोटे फितूर उभे केले तेच मी आता सांगतो. दोन असामी इंग्रजी तेविसावे फलटणीतील चाकर, यास मुंबई गव्हर्नमेंटानी लाच रुपये देऊन खोटे फितूरी तरकट उभे केले.
हे तरकटी काम उत्पन्न करण्यास अंताजी ब्राम्हण हा मूर्ख बेवकूफ होता. आणि मुंबई गव्हर्नमेंट लिहितात की हा ब्राम्हण खरा. हा माणूस फार खराब आहे. यानी हे तरकट उत्पन्न केले. या मुंबई गव्हर्नमेंटानी चित्तांत आणिले की या ब्राम्हणाची साक्ष राजास पेचात आणण्यास मजबूत पुराव्यास चांगली नाही. तथापि कशीहि असली तरी चिंता नाही. साक्ष पाहिजे. तेव्हा ही साक्ष बरी आहे.
अथवा करूनहि साक्ष घ्यावी किंवा असे करावे येविशीच्या भ्रांतीत पडून विचार करिता -करिता मोठी युक्ति दिलात आणून राजास पेचात आणण्याबद्दल मुंबई गव्हर्नमेंटानी कशा प्रकारची तजवीज केली ती तुम्ही पहा. सर रॉबर्ट ग्रेट गव्हर्नर मुंबई यानी सातारियास मेजर जनरल लॉडवुइक रेसिदंटीवर छत्रपतीचे दरबारात होते, त्यास खुणेचे गुप्त पत्र कृत्रिम करण्याबद्दल पाठविले. त्या हुकमाप्रमाणे जनरल लॉर्डवुइक यानी महाराजाशी दगलबाजी करून फाशेपारध्याच्या जाळ्याप्रमाणे जाळे घालून अशा हिकमतीने पेचात घालून धरावे म्हणजे भिवून राजानी फितुराचा गुन्हा कबूल करावा अथवा आंतीने वहिन उत्पन्न करावा. अशी दुलग दगेबाजीने गुप्त काम केले. हे मी सांगतो त्याजवरून तुम्हांस वाटेल की हा आम्हास कहाणी सांगतो. परंतु तसे नाही. तुम्ही चित्तांत काही संशय आणाल तरी बजिनस जनरल लॉडवुइक यानी ईस्ट इंडिया कंपनीचे डिरेक्टर्स यास पत्र लिहिले तेच खास मी तुम्हां सर्वत्रास आतांच तात्काल दाखवितो. ते पहा. ता. ९ आक्टोबर १८४० चे पत्रांतील मजकूर-
"मुंबई गव्हर्नमेंटानी आपली पहिली चाल बदल करून हल्ली बहुत पक्केपणा या कामांत ठेवण्याबद्दल आणि बाहेर जाहीर करण्याकरितां व जनास गुन्हा दाखविण्याबद्दल ही तजवीज केली."
परंतु पहा, हा कागद जर मजजवळ नसतां तरी मोठ्या आश्चर्याचीच गोष्ट होती. परंतु हा असल कागद बजिनस माझे हातांत. त्यांतील थोडे मजकुराची खबर मी पेशजी सुप्रिम गव्हर्नमेंट व कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स यास लिहून पाठविलीच आहे. पहा मुंबई गव्हर्नमेंटानी हे सिपाई हिंदू लोक यांच्या साक्षीवर बहुत भरवसा ठेवून हे मोठे मजबूत भारी काम आहे म्हणोन मतलब केला. कारण याच सबबीवरून राजास येविषयींचा जबाब विचारून घ्यावा. आणि राजास मुंबईस न्यावे. आणखी याच कलमाचे सबबीवरून राजाचा मुलुख घ्यावा, म्हणोन मुंबई गव्हर्नमेंटानी ही तजवीज केली आहे. ती या वेळेस आम्ही समजाविली असतां हे काम बुडणार नाही. याजकरितां चौकशी करावी. आणखी या कामांत पुर्तेपणे पहाता राजाचे तर्फे गुन्हा काही लागू होणार नाही. आणि हा मजकूर मी न भीता साफ समजावितो. लॉडउईक रसीदंट म्हणतात की-
मला सर रॉबर्ट ग्रँट मुंबई माजी गव्हर्नर यानी गुप्त कागद लिहून पाठविला की तुम्हांस आम्ही जे लिहिलें आहे त्याप्रमाणे तुम्ही करावे. त्या कागदांतील हशील मजकूर फलटणीतील सिपाई लोकांनी प्रथम जाऊन राजाची भेट घेतल्याबद्दल हुकूम घ्यावा. नेटीव्ह ऑफिसर म्हणजे हिंदू सरदार. आणखी या सिपाई यांनी जाऊन राजाशी बोलावे की आम्ही महाराजाचे हुकुमाप्रमाणे फितुराचे काम केले आहे. परंतु या फितुरी कामाचा बोभाट जाहला. याजकरिता महाराजानी आमचा बजाव करावा. आणखी नेटीव्ह ऑफिसर म्हणजे हे सिपाई यानी राजाशी बोलावे की आम्ही या फितुराचे सबवेवरून इंग्रजी गव्हर्नमेंटाचे मोठे पेचात आलों याजकरितां आम्हांस पळून जाऊन आपले जीव वाचवणे जरूर आहे.
याजकरितां आम्हास महाराजानी खर्चास रुपये द्यावे. म्हणजे आम्ही पळून जाऊन जीव याचवून गुजारा करू, आणखी या सिपाई यानी राजाशी बोलावे की महाराज आम्हास रुपये देत नाहीत तरी चाकरीस ठेवावे. जर महाराजानी त्यास चाकरीस ठेवितो म्हणोन करार केल्यावर या सिपाई यानी राजाचे सहीशिक्यानिशी कागद लिहून राजापाशी मागून घ्यावा. कारण राजानी जरी रुपये न दिले तरी हे साक्षीस मजबूदीस येईल. `अगर राजाचे सही मोहरे निशी कागद मिळाला असता या सिपायानी हा राजाचा कागद तुम्हापाशी आणून द्यावा, म्हणजे या कामास फार फार मजबूती होईल`, परंतु राजा हे काम कबूल न करिता या सिपाई यास धरून तुम्हाकडे पाठविल्यास तुम्ही त्यास कैद करूं नयेत अथवा या सिपायाची बदनामी करून लिहिण्यास तुम्ही राजाचे समजुतीबद्दल सिपायास कैद करावे म्हणजे अशा कारणानी वहिम उत्पन्न होऊन नंतर फितुर करणारे लोकास धरून चौकशी करण्यास ही चांगली सबब होईल, लॉडवुईक रेसिदंट लिहितात की, माझी हुरमत आहे त्याप्रमाणेच मी हुरमतीनेच काम करित आलो.
त्यास या कामाची तजवीज व कर्णीची शिस्त पाहून मी आपली सारी उमर दिलात आणून फार लाचार जाहालो आणि हे काम गुप्त असता मी हे जनजाहिर करितो. कारण मी आपली अब्रू व नामदारी साफ होण्याबद्दल हे समजवितो की सर रॉबर्ट ग्रेट याच्या लिहिण्याप्रमाणे काही मी न करिता आपले अब्रूबद्दल या फितुरी कामास हातचे सोडून दिले.
आणखी पहा. सर रॉबर्ट अँट याचे गुप्त पत्र ता. १६ आगष्ट १८३६ पार्ल. पा. १३१० जुजबी हंशील-
जनरल लॉडवुइक यास- तुम्ही आम्हास जलद पत्र लिहून पाठवावे की सातारचे राजावर फितुराचा वहिम होता, परंतु आज दस्तऐवजी पुरावा मिळाला. त्याजवरून राजावर फितुराचे शब्द लागू होतील येविषयी जलद चौकशी करावी म्हणोन तुमचे जलद लिहिणे यावे.
या प्रकारचे बेअब्रूचे खराब काम मुंबई गव्हर्नमेंटानी केले. परंतु ते हे जनरल लॉडवुईक यानी आपले साफ अब्रूने निर्मळ दिलानी आणि नौकरीच्या रीतीने बजिनस हा दस्तऐवजी मुद्दा जनजाहिरीत आणून चौकशी समयी दाखविण्याबद्दल कबूल केले असता, या कामात कोर्टानी काहीच तजवीज केली नाही. हिंदूस्थानात गव्हर्नमेंट अशी अति दुष्ट अनन्वीत कामे आपले मतलब साधण्यास वा नफा होण्याबद्दल तरकटे करून गुप्त ठेवण्याविषयीं ताकिदी करितात. प्रकट करू नये म्हणतात. आणि हरप्रकारें गुप्त ठेवण्याबद्दल हेच बेअब्रूचे गव्हर्नमेंट मदत करितात, परंतु अखेर परिणाम ईश्वरी कृपेनी हे दुष्ट कर्म बाहेर येऊन जगप्रसिद्ध जाहाले. हेंच तुम्ही पहा. मुंबई गव्हर्नमेंटानी हा खुणेचा गुप्त कागद रेसिदंटाकडे पाठविला.
परंतु प्रथम पावला नाही. सबब मोठे दिलगीर होऊन हे तरकटी गव्हर्नमेंट फार चिंताक्रांत जाहाले होते. जनरल लॉडवुइक आपले पत्रांत लिहितात की राजाचा नाश व खराबा करण्याबद्दल गव्हर्नमेंटानी असे लक्षांत धरून हा डाव करून पुन्हां हेंच मुंबई गव्हर्नमेंट कोर्ट (ऑफ) डिरेक्टरास य सुप्रीम गव्हर्नमेंटास लिहून पाठवून ख़बर दिली की सातारच्या राजानी तेविसाव्या फलटणींच्या सिपायाचे नेटीव म्हणजे हिंदू अमलदार याशी फितुर केला. पहा. फितुर करणारे हेच. दुसरे, राजानी फितुर केला म्हणणारे हेच. तिसरे या फितुराची चौकशी करणारे हेच. चवथे राजानी फितुर केला म्हणोन लिहिणारे हेच. पांचवे या फितुरीचा मजकूर राजास काही माहित नाही.
या मुंबई गव्हर्नमेंटापाशी काही या फितुराचे पुराव्यास मुद्दा निश्चयरूप नव्हता. सबब हे असे तरकटी काम केलें. तत्रापि जर काही मुद्दा असता तर ते दडवून ठेविते की काय? परंतु काही मुद्दा नाही. याजकरितां असे हे गुप्त खुणेचे कागद तरकट बनावून खरेपणा दाखविण्याबद्दल हा मोठा प्रयत्न केला तो बाहेर आला. परंतु असे करून दाखविण्याचे कारण काय होते म्हणाल तरी पहा. या राजास याच गव्हर्नमेंटाची निरंतर मदत करण्याचा करार असता याच गव्हर्नमेंटानीं तरकटी खोटे फितूर करून ही लबाडीची कामे केली असे कोणी म्हणतील. सबब हरप्रकारें करून राजास आपले गुन्हयांस आणावा आणि राजानी हा गुन्हा केला म्हणोन जगास आपली सुरेखी दाखविण्याबद्दल सदरहू तरकट केलें. याच कामावरून गव्हर्नमेंटाची अब्रू गेली. तेव्हां असे प्रत्यक्ष समजून उमजून पुन्हा आपले अब्रूचा बचाव कसा होतो हे विचार करून पहातां जेव्हां गव्हर्नमेंटाचा उपाय नाही तेव्हां हे तरकट खरे करून दाखविल्याशिवाय दुसरी तोड नाही.
सबब ही नाना प्रकारची तरकटे करून राजानी फितूर केला म्हणून गुन्हा लाविला. तेच हे काम पहा. गव्हर्नमेंटानी सीक्रेट कमिशन म्हणजे गुप्त पंचाईत चोरटे पाठवून आपले मनातील मतलब न सुटू देतां जोरानी तजवीज करावी असा निश्चय करून सातारियास कमिशन रवाना करावे; आणि गुप्त कमिशन जाऊन त्यानी बहुत सावधगिरीने गुप्त साक्षी घेऊन चौकशी चालवावी. त्याप्रमाणे या कमिशनानी करून चौकशीसमयी राजानी जातीने पुन्हा जावे अथवा वकील पाठवून तजवीज पहावी तरी या चौकशी समयी कोणासहि या कमिशनानी येऊ दिले नाही. शेवटी या चोरट्या कमिशनानी गुप्त रीतीने तरकट करून त्यानीच राजानी गुन्हा केला म्हणोन ठराव केला तो पहा. एकतर्फी व तरकटी मनुष्यांची तरफदारी करून व निर्दय व पाप भीति मनात न आणता अक्षर दर अक्षराने खोटा ठराव केला. पहा साक्ष.
मी ऐकिले आहे की लंडनचे सख्त हुकमतीखाली पेशजी कमिटी म्हणजे एक पंचाईत अशी होती. तिचे नाव इन्व्किझिशन व सिक्रेट म्हणजे गुप्त पंचाईत. यानी अति गुप्त चौकशी करावी. गुप्त साक्षी घ्याव्या. गुप्तरूपे गुन्हे ठरवावे. मनुष्य मात्रास इजा द्यावी व त्रास देऊन नेहमी पीडा करावी असे होते. तेच हे हल्ली इन्क्विझीशन ब्रिटीश इंडिया, परंतु हे नाव बदल करून सिक्रेट कमिशन नाव ठेवून हे आत गुप्त पंचाईत बसून गुप्त गुप्त रीतीने हे तरकट करून राजास अन्यायदार ठरविण्याबद्दल तजविज केली ती पहा. या कर्मियन यानी गने व कार्या व याचे मोठ्या मेहनतीने तरकटी अगाल चालवून शरीर शक्ति सार सामर्थ्य खर्च करून हे तरकट बनावून गुप्त गुप्त गुन्हे ठरवून राजास मोठे दुःख दिले. पहा हो हे हिंदूस्थानात गव्हर्नमेंट इंग्रेजी अमलात जे जे लोक आहेत त्याजवर अशा प्रकारच्या अति गुप्त कमिट्या नेमून सदरी लिहिल्या अन्वये खराब कामे करितात.
जनरल लॉडवुइक रेसिदंट या कमिटीचे चेअरमन म्हणजे मुख्य अधिकारी केले. परंतु पहा. हे उगीच निर्मित्यास यास मुख्य म्हणोन नाव ठेविले. आणि राजादरची मोकदम्याची चौकशी पहाण्याचा गव्हर्नमेंटानी हुकूम दिला. परंतु पहा या दोन आसामी कमिशन बनावून या दोन असामी कोण म्हणाल तर मि. उल्बी व कर्नल ओव्हन्स-यास गव्हर्नमेंटानी नानाप्रकारचे उपदेश गुप्त रीतीनी करून तुम्ही जाऊन असे करा, असे करा, म्हणून नेमून मुंबईहून मुद्दाम पाठविले. त्यात एक उपदेश चमत्कारीक आहे तो पहा. या कमिशनाचे रेसिदंटच मुख्य असले तरी काही चिंता नाही. परंतु ते तुम्हा दोघांचे ठरेल त्याप्रमाणे चेअरमन लॉडवुइक यानी मान्य करावे, पहा गव्हर्नमेंटचे पत्र ता. २४ आक्टोबर १८३६ पार्ल बुक १ पा. ५२० कलम ४. मि. उल्बी सेक्रेटरी मुंबई गव्हर्नराचे जीवाचे दोस्त आणि मोठा विश्वासू याच्या तजविजी साऱ्या कृत्रिमी व तरकटी दगलबाज, याच्या अकलेचा हा प्रकाश आहे. पहा या उल्बीने त्या कागदात मनास आले तसे उलटपालट मजकूर फिरवाफिरव करून लिहून घालमेली खोडाखोड करून मिळून मिसळून काम केले आणि याच कृत्रिमावरून राजावर गुन्हे ठरवून लिहिले.
पहा दुसरा कमिशनर कर्नल ओव्हन्स होता. हा माणूस याचे काम आता मी तुम्हास समजावितो त्याजवरून मजकूर तुमचे लक्षांत येईल. यानी आपले मनात डाव धरून जनरल लॉडवुइक यास सातारचे रेसिदंटीवरून काढवून आपण रेसिदटीवर जाऊन नाना प्रकारची तरकटी दुष्ट कामे करून याच कामाबद्दल सालिना पगार पहिले रेसिदटाचे पगाराशिवाय जास्ती पौंड ४००० चार हजार घ्यावे आणि या रेसिदंटाचे जाग्यातील मान व प्रतिष्ठा व नफा आपल्यास मिळावा अशी इच्छा करून चित्तांत आणिले की आपण जाऊन राजास फितुरी ठरविणे हे काम अगत्य हरप्रयत्नाने व तजविजीने गुप्तरुपे केले म्हणजे आपल्यास फायदा होईल या हेतूने (गेला), राजा अन्यायदार नव्हता. लॉडवुइक रेसिदंटीवर असता उपाय न चाले. तेव्हा या गव्हर्नमेंटाचे दिलात आले की जनरल लॉडवुइक याची बदली करून हे मशारनिल्हे पाठवावे. परंतु बदली करण्यास काही जोर नव्हता. परंतु काही एक सबब ठेवून बदली केल्याशिवाय आपला मतलब साधत नाही. तेव्हा राजाचे आणि रेसिदंटाचे नीट नाही हे निमित्य ठेवून लॉडवुइक याची बदली करून त्याचे ठिकाणी ओव्हन्स हे तरकट सिद्ध करण्यास जाऊन या दुष्ट तरकटीने राजावर फितुरी गुन्हे शाबूद केले.
मुंबई गव्हर्नमेंटानी आपले पद्धतीचे सदरहू असामी पाहून नेमून गुप्त रीतीने कामे सांगून त्याप्रमाणे हे गुप्त कमिशन सातारियास पाठवून सिक्रेट कमियन म्हणजे चोरटे पंचाईत जाऊन सातारचे राजानी फितुर केला, अशी सबब दाखवून चौकशी चालविली तें काम पहा. हे राजाचे मुलुखांत येऊन या कमिशनानी हे तरकटी व दुष्मान अशा साक्षी आपले समक्ष आणून सर्व जनास राजाचा कमजोर दाखवून आणि छत्रपतीचे पाठीमागें या चोरट्या कमिशन यानी मोठ्या युक्तीनी हिकमत कशी केली की राजाचे रयतेनी हे कृत्य पाहून मोठे भयभीत होऊन मोठा अनर्थ वाटून सर्वत्र चिंताक्रांत होऊन सारे लोकांचा अहाःकार जाहाला, परंतु हे रयत वगैरे लोक सहजी भ्याले असे काही नाही. परंतु या कमिषनाची दगेबाजी व कृत्रिमी चौकशी करण्याची तरकटी शीस्त फार भयंकर आणि अनीतीचे हे अनर्थाचे काम नजरेत आणून सर्वत्र भयद्रुप जाले. जनरल लॉडवुइक रेसिडंट सातारा प्रोप्रायटर ईस्ट इंडिया स्टॉक जनरल कोर्टात ता. १५ जुलाई सन १८४१ रोजी बोलून सर्वांस जाहीर केले ते पहा.
महाराज छत्रपती सातारा याजवरील मोकदम्यांत कमिशन यानी कोणत्या प्रकारें व कशा तजविजींनी कसकशी कामे केली त्याचा मतलब व लबाडी व बनावणी व स्वार्थ व अर्थ तुम्ही आता ऐका. याचा मतलब कोणता होता तो दिलांत आणा. मुळापासून महाराजाचा खरेपणा व सत्य व नीतीन्यायाचे काम बुडवून व खोट्या तरकटी साक्षी उभ्या करून त्याजपासून जबान्या लिहून घेऊन जनास खरेपणा दाखविण्याबद्दल त्याजपासून खोट्या क्रिया शपथा करून ते कागद घेऊन नाना प्रकारच्या रचना व तुफाने उभी केली. हे तरकटी गुन्हेगार याची पारिपत्ये होऊ नयेत आणि या खोट्या लोकांचा बचाव करण्याबद्दल मुंबई गव्हर्नमेंटानी या खराब लोकास बहादरी देऊन मदत करून गुप्त ठेविले.
पहा. साक्ष जनरल लॉडवुइक माजी रेसिदंट सातारा याचे बोलण्यापैकी मजकूर-
मी सातारियात होतो तेव्हा या पंचाइतीत माझे समक्ष जाहालेला मजकूर तो मला माहीत आहे. तोच मी आता न भीता दील मजबूत करून तुम्हास सांगतो की हे कमिषन म्हणजे पंचाईत माझे मत हे पंचाईत यथान्याय करून सत्य पाहाता हे या पंचाईतीस अगदी योग्य नाहीत. येविषयी मी विनंती करून त्या समितीचा मजकूर समजावितो की तेविसावे फलटणीचे सिपाई लोकांचे हिंदू अमलदारांस हुकूम जाहला की तुम्ही कमिशन याजकडे जाऊन रुजू होणे, त्याप्रमाणे हे साक्षीदार येऊन हजर जाहले. ते समयी मी त्याचा यथायोग्य खरा मजकूर समजविण्याबद्दल पुरसीस उलाटापालट इनसाफाच्या शिरस्ते अन्वय कसोशीने घालून चौकशी करावी म्हणोन प्रयत्न केला आणि प्रथम एक असामीस बोलावून मी सवाल करितांच तो साक्षीदार घाबरा होऊन भयभीत जाहला. तेव्हां क. ओव्हन व मि. पाहून त्या साक्षीदारास मदत करून मधी मला सांगितले की त्यास तसे बोलून सवाल करून विचास नये म्हणोन बोलले.
या साक्षीदाराची पुर्तपणे अदलनीतीनी जर चौकशी केली असती मला पुर्ती खातरजमा होती की या साक्षीचे तुकडे तुकडे होऊन तेव्हांच मोडून खाली जमिनीस पडते. दुसरे या सिपायाचे अमलदाराविषयी ऑनरेबल कोर्टास साफ आणि सत्य खरे सांगतो की जेव्हा हा अमलदार साक्ष देत होता त्या समई या साक्ष देणाराचे मुख व चेहरा प्रेताप्रमाणे दिसला. परंतु पहा जर कोणी मला मनुष्य अब्रूचा असतो तो खरा मजकूर सांगून साक्ष देतो आणि खऱ्या शिवाय दुसरे कांही बोलत नाही व मुख चेहरा फिरोन वाईंट न दिसता चांगला हुशार दिसतो. त्याप्रमाणे या साक्षीदाराचा चेहरा त्या वेळी नीट दिसला नाही. हा साक्षीदार खोटा सबब त्याचा चेहरा मृत्युक्त् जाहाला होता हे मी दुसरे दोघे कमिशन यांस त्याच समयी त्या साक्षीदाराचे मुख व रंग दाखविला. परंतु त्या उभयेतां कमिशन याणी माझे सांगणे व बोलणे दिलांत आणिले नाही.
आणखी या साक्षीदारांचा खोटेपणाचा मजकूर जो मी आपले नजरेनी पाहिला तो प्रगट करण्याविषयीची तजवीज केली. परंतु अदल इनसाफाच्या सिरस्तेप्रमाणे या साक्षीदारास सवाल जबाब घालून मला पुरी चौकशी या उभयतांनी करूं दिली नाही. हे माझे पंचायतीचे सोबती गेल्यानंतर या साक्षीदाराचा चेहरा पुन्हां खातेपिते चांगले मनुष्याप्रमाणे दिसला. ही सातारियांत कमिशनापुढे बजिनस या दोघां साक्षीदारांची कथा अवस्था त्यासमयी जाहाली तो मजकूर मी तुम्हास सांगितला. आता यात बाकी काय राहिले ते सांगतो. खोट्या क्रिया शफता वाहून खोटे बोलणारे व लबाड बोलणारे व खोटे बनाऊ कागद देणारे असे हे नामी नामी उंची दस्तऐजी कागद असे तऱ्हेने घेतले ते मि. उल्बी पोलिटिकल सेक्रेटरी यानी आपले कारभाराचे पेटीत मोठ्या बंदोबस्ताने कुलुप घालून ठेवित होते.
हे त्या समईचे मला पुर्तेपणे स्मरण आहे. आणि मी तेच वेळी बोललो तेच शब्द दर शब्द सांगतो की, "राजावर गुन्हा ठरविण्यास व फितुराची शाबुती करण्यास हे दस्ताऐवजी कागद सारे अगदी समूळ खोटे आहेत."
पहा, सातारा मुक्कामीचे कमिशनाचे हे मुख्य चेअरमन जनरल लॉडउइक होते. त्यानी लंडन मुक्कामी जनरल कोर्टात ईस्ट इंडिया हौसांत प्रसिद्धपणे कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स यास सदरहू मजकूर बोलून जगजाहीर केला. कमिशन म्हणजे पंचाईत. याची आपआपसात ही बोलणी जाहाली. परंतु हा मजकूर राजास माहित नाही व त्यावेळी ऐकिला नाही. आणि ज्या साक्षी या कमिशन याणी उभ्या करून त्याजपासून जबान्या घेतल्या त्याच्या नकला या कमिशनानी राजास दिल्या नाहीत. या साक्षीदाराचा मजकूर काही एक समजाविला नाही. आणि महाराज छत्रपती साहेबास यातील मजकूर व काहीएक अक्षर माहित नाही. असे प्रकारचे या फितुराचे मोकदम्याचे हे पहिले कलमाचा मजकूर असता या दृष्ट कमिशनानी याच साक्षीवरून राजावर फितुराचा गुन्हा ठरविला आहे.
आक्टोबर सन १८३६ रोजी जबानी सौव गुलामसिंग सुभेदार यानी शफत करून लिहून कमिशनापाशी दिली त्यापैकी जुजबी मजकूर-
"आम्ही राजवाड्यात गेलो आणि राजाचे भेटीस जिना चढून जाताना सारे बराबर मिळून गेलो ते सांगतो. प्रथम दिवाण, याचे मागे दुसरा अंताजी, त्याचे मागे तिसरा मी, माझे मागे गुलजार मिसर, येणे प्रमाणे आम्ही चौघे जाऊन राजाची भेट घेतली."
पहा. हे तरकटी सुभेदार हरामखोर कसे आहेत तो मजकूर-
सीव गुलाम शफत करून लिहून देतो की सारे राजवाड्यांतील कचेरीचे सोपर्यातून "डावे हातानी माडीवरचे खोलींत जाऊन राजास भेटलों." गुलजार शफत करून लिहून देतो की आम्ही सारे राजवाड्यांतील कचेरीतून उजवे हातानी जाऊन खालचे. खोलीत जाऊन राजास भेटलों. "गोविंदराव म्हणतात" हा मजकूर मला माहीत नाही. संत्री खोटे बोलतात. "अहमदनगरात हॅट जज्जानी लिहून घेतले त्यांत लिहितात" राजाची भेट बाहेरच चौकांत जाहाली. हे जबरीने लिहून घेतले. कमिशन अंताजीस खोटा म्हणतात, आणि सदरहू दोघांस खरे म्हणतात. परंतु मी समजावितो, दोघे सुभेदार व तिसरा अंताजी व चवथा उल्बी व पांचवा ओव्हन्स येणेप्रमाणे तीन साक्षी व दोन कमिशनर्स येणेप्रमाणे पांचहि खोटे. हे कशावरून प्रमाण म्हणाल तरी या तरकटी कमिशन याच्या कागदावरून दस्ताऐवजी खोटेपणा दाखवितो पहा. पार्लमेंटरी रिपोर्ट पाने ३२७ ३३०, ३३१ ३४२ ३४३ ८७२. १०६१ वगैरे.
सिव गुलाम लिहून देतो "राजापाशी बायको बसली होती, तीस माडीवरचे खोलीतून खाली दिवाणानी घालविली, `गुलजार लिहून देतो` राजा एकटा बसला होता. `पुन्हा लिहून देतो` राजापाशी बायको बसली होती. ती आम्ही जातांच खालच्या खोलीतून बाहेर पळून गेली. "सिव `गुलाम लिहून देतो` आमच्या भेटी समयी राजाचे डोईस पागोटे नव्हते. ‘गुलजार लिहून देतो’ आम्ही भेटलों तेव्हां राजाचे डोईस पागोटे होते." असा मजकूर बहुत आहे.
एकूण चार साक्षी व दोन कमिशनर्स यांचा सारांश. हे कमिशन आंधळे होते? दिवाणे होते? तर हे कसे जाहाले? तरकटी व कृत्रिम व दगेबाजी व निर्दयी असे प्रकारचें असतां यासच तरकट करण्याचा ह्या गव्हर्नमेंटचा हुकुम तुम्ही म्हणाल हे सख्त बोलतात. तरी तसे नाही. पहा या कमिशनच्या साक्षी. एक म्हणतो उजवे हातानी गेलो. म्हणतो हातानी गेलो, तिसरा म्हणतो हे मला माहित नाही. चवथा एकदां एक बोलतो, दुसरे वेळीं दुसरेंच बोलतो. यास खोटा म्हणतात. आणखी हे तरकटी काय म्हणतात? एक म्हणतो वरचे खोलीत भेटलो. दुसरा म्हणतो खालचे खोलीत भेटलो. दिवाणापाशी चौकात भेट झाली लिहून घेतात. एक म्हणतो राजाचे डोईस पागोटे नव्हते. दुसरा म्हणतो राजाचे डोईस पागोटे होते. तिसरा म्हणतो मला स्मरण नाही. एक म्हणतो राजापाशी बायको होती. दुसरा म्हणतो राजा एकटा होता. तिसरा म्हणतो राजास भेटलो नाही. उल्दी व ओव्हन्स म्हणतात या साक्षी खऱ्या आहेत. या कमेटीचे चेअरमन व रसिदंट लाँडउइक म्हणतात या साऱ्या साक्षी खोट्या लबाड तरकटी आहेत.
क. ओव्हन्स लिहितो की राजानी आपले हातानी विडे सुभेदार यास दिले. (पाल रि. पा. १०६६) अंताजी म्हणतो राजानी दिले नाहीत. सुभेदारास गोविंदराव यानी दिले. बालाजी नारायण नातू म्हणतात राजा आपल्या हातानी विडे देत नाही. अखेर पहा. लॉर्डवुईक रेसिदंट म्हणतात काल संध्याकाली माझी आणि राजाची भेट जाहली तेव्हा मला विडे दिले. हे तुम्ही दोघे कमिशन बजिनस पहा. हे राजाचे विडे नव्हते. हे सुभेदार खोटे लबाड आहेत.
ता. १९ आक्टोबर सन १८३६ रोजी कुशा याजपासून जबानी लिहून घेतली. त्यात लिहून देतो की मला कैदेत ता. ७ आक्टोबर रोजी कैद करण्यापूर्वी पंधरा दिवसा मार्गे भेट जाहाली. त्याजवरून पाहता ता. २२ सप्तंबर रोजी भेट जाहाली म्हणतो. परंतु दोघे संत्री सुभेदार लिहून देतात की ता. २१ जुलै सन १८३६ रोजी भेट जाहाली याजवरून पहाता बासष्ट दिवसाचा फरक आहे. पहा. या कमिशनाचे तरकट आणि त्याच्याच ह्या साक्षी! कोठे आहे फितूर?
सिव गुलाम लिहून देतो `मी डोईचे पागोटे काढून राजाचे पायावर डोई ठेवून सांगितले की आमचे भेटीचा मजकूर महाराजानी इंग्रजी सरदारास सांगू नये.` चंदेसिंग हवालदार लिहून देतो की मला शिवगुलामसिंग सुभेदार यानी सांगितले की आम्ही राजवाड्यात जाताच उपरांत जाऊन इंग्रजी पलटणचे साहेब लोकास खबर दे. त्याचप्रमाणे मी खबर दिली. `पहा, दोन सुभेदार व एक हवालदार ऐसे तिघेहि इंग्रजी फलटणीतील चाकर.` अखेर पहा. सर रॉबर्ट ग्रेट गव्हर्नर मुंबई रेसिदंटास लिहितात सिपाई पाठवून फितूर करून राजाचे सही शिक्क्याचा कागद घ्यावा म्हणजे मजबूत पुरावा होईल. लॉडउइक रेसिदंट म्हणतात हे खोटे काम करण्याचे भी कबूल न करिता आपले अब्रूचा बचावाबद्दल या फितुरास हातचे सोडून दिले. बाळाजी काशी किये हे रेसिदंटाचे चाकर लिहून देतात की राजाचे सही शिक्क्याचा कागद मजजवळ आहे. तो मी बाळाजीपंत नातूस दाखवून आपले जवळ ठेविला होता तो हा हजर आहे. (पार्ल. रि. पा. १०९९ व १११०).
ओव्हन्स रेसिदंट म्हणतात या कागदाचा मजकूर काही दिवसामागें मला बाळाजीपंत नातूनी सांगितला होता. परंतु हे काम मुष्किल, सबब मी कबूल केले नाही. (पार्ल. रि. पा. ४५७ क. ५). कॅप्टन ड्युरक लिहितात की ओव्हन्स रेसिदंटाचे हुकुमानी हे कागद घेण्याबद्दल भाऊ लेले यास रु.१५० दिले. (पार्ल. रि. पा. ६४१) भाऊ लेल्या म्हणतो मी दिडशे रुपये घेऊन कागद करार केला त्याप्रमाणे हजर आहेत. (पार्ले, प. १०९९) अखेर ओव्हन्स रेसिदट खोटी शफत करून लिहितात की अशा कामाबद्दल रुपये दिले नाहीत (पा. पा. १११). पहा. कोठे आहे फितूर? सांगा बरे. हा फितूर मुंबई गव्हर्नमेंटानी केला. हे मुद्दे कसे आहेत म्हणाल तरी बजिनस सदरील लिहिली नांवे याचे हातचे कागद पार्लमेंटातून छापिले. त्यात हा मजकूर मेला ईश्वरानी दिला. पहा तुम्ही सर्वत्र हे तरकटी काम. यापरते काय सांगू? राजा निर्दोष आहे.
या गव्हर्नमेंटानी फितूर केल्याचे हे एक कलम त्या लोकांनी मोठ्या मेहनतीने बनविले, त्याची दशा ही आहे. परंतु सदरहू दुष्ट कर्म जनास प्रगट जाहाल्यावरून या मुंबई गव्हर्नमेंटास राग येवून एक हे कल बुडाले तरी चिंता नाही. दुसरे उमे करून मनोरथ तृप्त होण्याबद्दल व सदरहू भयाची निवृत्ति व्हावी आणि अब्रूची साफी करावी. सबब पुन्हा कसे प्रकारची तजवीज केली ती नजरेत आणा. मुंबई गव्हर्नमेंटानी महाराज छत्रपतीस पेचात घालण्यास तरकटी व खोटी फितुरी कलमावर फितुरी कलमे मन मानतील तशी उभी करून मोठी भरती पर्वताप्रमाणे भारी ओझे करून त्याखाली राजास दाबून ठेवण्याचे इच्छेनी केली. ती सारी अशीच ही कलमे आहेत. या फितुरी खोट्या कलमाची गणति करण्यास फार मुष्किल आणि कोणी चित्त ठेवून पहाता उलगडा करण्यास अथवा मनुष्याचे समजुतीत येण्यास ही मोठी अवघड अशी ही तरकटी अकलेनीच कामे केली आहेत. परंतु जनरल लॉडउइक रेसिदंट हे अशी तरकटी कामे करण्यामाफक मनुष्य नव्हते.
त्याजवरून मुंबई गव्हर्नमेंटानी चित्तात आणिले की हे रेसिदंटीचे काम चालवण्याचे उपयोगी नाहीत. सबब नापसंद करून रेसिटीवरून काढिले. परंतु त्याविषयी गव्हर्नमेंटास राग येण्याचे कारण काय म्हणाल तरी जनरल लडउईक यानी राजास दगा करणे व ठकवणे व कृत्रिमीनी कामे चालवणे विषयी या गव्हर्नरानी खुणेनी साफ इशारा केला. परंतु लॉडउईक यानी सदरहू विषयीचे लिहिणे कबूल न करिता राजाचा नाश करण्याचे कारभाराचे कामात शिरले नाहीत. जनरल लॉडउइक यांच्या बोलण्यापैकी अक्षरे हल्ली मी तुम्हास समजावितो. नजरेत आणा हो बरे.
"गुप्त पंचाईतीपुढे ज्या साक्षीदारांनी साक्षी दिल्या तो मजकूर आता न भीता दिल मजबूत करून तुम्हास सांगतो. साक्षीदारांचा यथान्याय आणि खरा मजकूर समण्याबद्दल पुरसीसा उलटपालट इनसाफाचे शिरस्तेप्रमाणे कसोशीने घालून चौकशी करावी म्हणून मी प्रयत्न केला. आणखी या साक्षीदारांचा खोटेपणाचा सारा मजकूर जो मी नजरेनी पाहिला तो प्रगट करण्याविषयी तजवीज केली."
सदरहू मजकुरावरून मुंबई गव्हर्नमेंटानी विचार करून आपला मतलब साधून घेण्याबद्दल दुसरे प्रकारचा रेसिदंट पाठविण्याचे योजून लॉडउइक याची बदली करण्यास खोटी सबब लावून त्याजवर ठपका ठेवितात तो बजिनस पहा. ता. ६ जून सन १८३७. पार्लमेंटरी रिपोर्ट पान ३६० कलम ९ आम्हास माहित आहे. आणि त्याजपासून गुप्त केलेले. त्याजवरून गव्हर्नर गुप्त लिहितात. परंतु सही नाही. जनरल लॉउइक याजवर राजाचा भरवसा होता तो सारा बुडाला. तेव्हा या कलमावरून सहजच त्याची बदली करावी, आणि क. ओव्हन्स यास सातारच्या रेसिटीवर मुकरार करून पाठवावे. आणखी मुंबई गव्हर्नरच स्वतः बोलतात की, दुसरा रेसिदट पाठवून राजाचा भरवसा पुन्हा साधून घेतला पाहिजे.
"याजकरता पुन्हा भरवसा साधून घेण्याबद्दल रेसिदंटीचे कामावर क. ओव्हन्स मास जरूर जरूर पाठविले, त्यास हा कोणता भरवसा तो तुम्ही नजरेत पुर्तपणे आणा. हा क. ओव्हन्स रेसिटीवर जाऊन राजास त्याने गुप्तरूप फितुरी ठरविले. हा भरवसा पुन्हा साधण्यास या तरकटीस रैसिदंटीवर गव्हर्नरमेंटानी पाठविले. या गव्हर्नमेंटाचे काम आणि तरकट पहा. क ओव्हन्स यास रेसिदंटीवर पाठवून ता. १३ जून सन १८३७ चे पत्र लिहिले. त्यातील कलम ३. पहा", तुम्ही राजाची भेटी घेऊन बोलणे होईल त्या त्या सारे वेळी राजाशी तुम्ही फार न बोलता तुम्ही आपले मुख बंद ठेवावे. याप्रमाणे गव्हर्नमेंटाना प्रथम कसे प्रकारचे चालीचे पाऊल अथवा शीस्त कशी राजाचे कामात ठेविली होती.
तेंच रेसिदंट या रेसिदंटीचे कामावर पाठविण्याचे पूर्वी ओव्हन्स यास दगेबाजीची मसलत शिकवून त्यांनी हुकूमाप्रमाणे सदरहू तरकटी कामे करावी म्हणून खास कबूल करून घेऊन नंतर ओव्हन्स याजपासी बिननांवाचा कागद हवाली करावा, अशी योजना करून हा सदरहू कागद मुंबई गव्हर्नमेंटानी आपले जवळ इ. स. माहे मार्च तागाईत जून सन १८३७ सहा महिन्या पावेतो जप्तीत मोठ्या बंदोबस्ताने ठेऊन या कागदाचा मजकूर जनरल लॉडउइक यास कळवण्यास भय वाटले म्हणून अथवा या गव्हर्नमेंटास शरम होऊन ठेऊन नंतर ओव्हन्स रेसिदंटीवर सातारियास पाठवून तरकटी काम करण्याची सुरुवात केली. याच कागदाची नक्कल मी ऑनरेबल कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स याजपाशी मागितली. परंतु मला दिली नाही. नंतर पार्लमेंटाचे हुकुमानी हे कागद मिळाले. ते पहा. (पार्ल. रि. पा. ५२७). या कागदांत असा मजकूर आहे की, फितुरी कामांत महाराज छत्रपति व त्यांचे परंपरेची मंडळीसह नांवे लिहून दाखवून कित्येक फितुरी कामे कोणी दुष्ट अविचारी मूर्खपणांनी मनस्वी वेडेपणानी करितो असाच मजकूर या पत्रांत लिहिला आहे.
आणखी हे दस्ताऐवज क. ओव्हन्स मुंबई मुक्कामी असतां गव्हर्नरानी आपले जातीनेच ओव्हन्स याचे हवाली केले होते. आणखी ओव्हन्स यास हुकूम देऊन खान नौकर सातारियास तुम्ही पोहोंचताच या कागदाचा लिहिणारा धणी कोण आहे याचा पक्का शोध करा म्हणून सांगितले. गिरजाबाई विधवा म्हातारी ही मोठी अब्रूदार माणूस होती. तीजपासून या फितुरी कागदांत जी नांवे लिहिली होतीं ती बाईपासून नांवानिशीवार पुरी शाबुति करून घ्यावी. आणखी सांगतो हा चमत्कार ऐका हो या फितुरीचे कागदांत नावनिशी लिहिली त्यांत या बाईने आपले स्वतःचे पुत्राचे नांव लिहिले आहे. या ठिकाणी तुम्ही मोठ्या मोठ्या बायकामंडळी हा मजकूर ऐकण्यास आला आहां. त्यास तुम्ही आपले पुत्रांवर असे काम कराल की काय सांगा हो? (मूर्ख, मूर्ख.)
क. ओव्हन्स यानी सदरहू कागद लिहिणाराची चौकशी करून वठिकाणा आणखी के. ओव्हन्स यानी खारा पुर्तपणे चौकशी करून शाबूत केले की, या कागदाचा लिहिणारा पुरुष आहे आणि या गिरजाबाई म्हातारीने साफ लिहिलेला नाही, असे खास ठरविले. आणखी पड़ा. या कागदांत मजकूर काय लिहिला तो आणि हा कागद लिहिणारा कोण माणूस आहे, येदिषयीची माहीतगारी या म्हातारे बाईस मुळापासून ठाऊक नाही.
यहां याच कागदास बाईचे नांव खोटे दुसऱ्या मनुष्यानी बनावून लिहिलेला आहे. सदरहु हा कागद समूळ प्रथमपासून अखेरपर्यंत खोटा दुष्ट बुद्धीने व द्रव्य लोमानी खोटेपणानी व लबाडी करून तरकटी मनुष्यापासून लिहून घेतला आहे. हे इतकेंहि कृत्रिम असून क. ओव्हन्स याणी हा कागद पक्का शाबूत करण्याबद्दल साक्षीदारांपासून जबान्या वगैरे घेऊन गुप्त पेटीत लावून मोठ्या बंदोबस्तानी ५ सप्टेंबर इ. सन १८३७ तागाईत आगष्ट सन १८३८ पावेतो छपवून अकरा महिने ठेविला. (पार्ल. रि. पा. ४३७.१०२८, ५२७ १०२७)
आणखी क. ओव्हन्स रेसिदंट यानी या कागदाच्या लिहिणारास आपण दरमहा रुपये देऊन आपले नजीक ठेवून या दरमाहेखेरीज वेळ दरवेळ कित्येक रुपये दिले हे शाबूत जाहाले आहे. आणखी अखेर पहा. महाराज छत्रपतीकडे व त्यांचे पदरचे मंडळीची या कागदांत जी नावे लिहिली होती त्याजकडून या फितुराची शाबुती करून घेण्याबद्दल हमेशा बोलणे वगैरे क्रम चालवून तजवीज करीत गेले. त्यावरून या क. ओव्हन्स यास सत्य खरेपणानी पुर्त माहित होते की, छत्रपति सरकार व त्यांचे पदरचे मंडळीकडे या फितुराचा गुन्हा लागू नाही. असे माहित असून बजिनस या ओव्हन्स यानी समजून उमजून मुद्दाम दुष्टबुद्धीने जसे कोणी खोटी मनुष्ये असतात आणि त्यास इजा देतात त्याप्रमाणे राजासह खरे असून त्याजवर हे खोटे तरकट बनावून इंजा देऊन या ओव्हन्स याणी मुंबई गव्हर्नमेंटास लिहून पाठवून समजाविले की, तुम्ही राजाचा सत्य व खरेपणा मनात न आणतां हें काम निरंतर तुम्ही कबूल करून या फितुराचा गुन्हा राजावर शाबूत करून जनांस दाखवावा. त्या बमोजिम गव्हर्नमेंटानी तरकट कबूल केलें. परंतु अखेर या कागदाचा मोठा पुकारा लंडन मुक्कामी जाहल्यावरून हा नुसता कागद अखेरीस प्रगट जनजाहीर जाहला आहे.
महाराज छत्रपती सरकारचे दरबारांत सातारा मुक्कामी सदरहू असे प्रकारचे रेसिदंटाचे काम ओव्हन्स यानी करून इंग्रजी फलटणे सातारा मुक्कामी होती त्याजवरही हुकूम करून जे काही या रेसिदंटाचे मनांत आले तशी उलटपालट कृत्रिमें करून तरकटे बनावून लिहून पाठवावे. त्याप्रमाणे मुंबई गव्हर्नमेंटानी कबूल करून जलद मदत अशा तरकटी कामास केली. आणखी ओव्हन्स रेसिदंटाचे काम महाराज छत्रपतीस व त्यांच्या पदरचे मंडळीस व रयतेस नित्य रोजबेरोज घडामोडी नवीनवी नानाप्रकारची तरकटी तुफाने उभी करून उपद्रव फार अनाहूत केला, येविषयीचा मजकूर मी किती सांगू तो गजहब ईश्वरास माहित आहे. त्याने अशी काही तरकटी दुष्ट अक्कल चालवून या कामांत दंगे व मतलब जे जे केले ते असे की, हे मजकूर इंग्रजी लोकांचे लक्षातच कदापि न याचे कोणी पाहू जाता काहीच कळू नये, हे खरे किंवा खोटे ते पहा.
ए. बी. सी. जी. एच. अशा या कागदांस खुणा संकेताच्याच. बहुत बहुत कागद, उंटाची ओझ्याची ओझी आहेत. त्यात जशी काही चोराची खूण चोरासच माहित असते, तसे हे काम करून ओव्हन्स याने उल्लीकडे पाठवावे. त्या खुणा या दोघानीय परस्परे समजावे समजावे. अशीच ही सारी तरकटी घालमेल केली आहे. आणखी पहा. मोठी मोठी प्रतिष्ठित राजमान्य मंडळी वगैरे याजवर हरएक निमित्त ठेऊन ही मनुष्यें लहान अगर मोठी हे काही दिलांत न आणिता या लोकांस राजाचे नजिक कैदेत ठेविले होते. आणि या लोकांपैकी ज्याणी ज्याणी या ओव्हन्स रेसिडंटाचे सांगण्याप्रमाणे खोटे तरकट करून त्यास सांगितल्याप्रमाणे त्याणी लिहून दिले त्यास सोडून दिले.
परंतु या लोकांनी रेसिदंटापाशी काय लिहून दिले, म्हणून त्यास आणून विचारावे तरी या ओव्हन्स याणी सांगून निरोप पाठवावे की, हीं मनुष्ये गव्हरमेंटाचे निगेवानीतील आहेत. असे हे तर कटीचे नांव ठेविले. आणखी ज्याणी काही हे खोटे काम कबूल करून काही लिहून दिले नाही त्यास सख्त इजा देऊन कैदेत ठेवून भयंकर मोठी पीडा करून मोठ्या बंदोबस्तानी अटकेंत ठेऊन जरब दिली. आणखीही सांगतो या मजकुरावर नजर ठेवा. कोणीही महाराज छत्रपति सरकारास जी जी पत्रे पाठविली ती व छत्रपतीनी हर कोणासही पत्रे लिहून पाठविली ती सारी या ओव्हन्स यानी रस्त्यांत जे गेले व आले ते सारे कागद धरून चोरून त्या कागदाचे लखोटे फोडून नकला घेऊन त्याचे इंग्रजी तरजुमे ओव्हन्स याचे मनास खरे खोटे आले त्याप्रमाणे करून त्याजवर या ओव्हन्स यानी आपली तरकटी अकल चालवून सला देऊन आपला स्वार्थ साधण्याबद्दल मुंबई गव्हर्नमेंटास पाठविले. ते पार्लमेंटाचे बुकांत पहा.
काय काय किती किती म्हणून दुःखे मी तुम्हांस सांगू? असा हा मोठा कीर्तिमान राजा असतां त्याणी अशी ही भयंकर खोटी तरकटी कृत्ये करून विचारा राजा मोठा लाचार जाहाला. पहा राजा त्रासला आणि आपले राज्य गव्हर्नमेंटास सोपवावे आणि आपण कोठे तरी जावे म्हणून राजा आपले राज्य गव्हर्नमेंटाशी बोलून राज्य साधीत होते. परंतु राजाचे बोलणे व मागणे गव्हर्नमेंटानी कांहींच ध्यानांत आणून कबूल केले नाही. महाराज छत्रपतीचे मागणे व बोलणे मुंबई गव्हर्नमेंटानी का कबूल केले नाही म्हणाल तरी, अथवा मुंबई गव्हर्नमेंट आणखी काय मागत होते, अगर काय मतलब होता हे विचाराल तरी पहा. या गव्हर्नमेंटाचे मनांत हे राजाचे स्वतःचे राज्य आहे हे उगीच कसे घ्यावे? आपण जरी घेतले असतां सर्वजन काय म्हणेल? तरी कसे प्रकारे करून घ्यावे? आणखी हे घेण्यास कोणता मतलब करून घ्यावे?
तरी फितुरी तरकटे नानाप्रकारची या राजावर उभी करून त्यास पेचांत आणून राजावर मोठा ठपका फितुरीचा ठेऊन सर्व जनांस दाखवून पहा कशा हिकमती करून हे गव्हर्नमेंट राज्य घेण्यास चाहात होते. सबब अशा नानाप्रकारची तरकटी फितुरी तुफाने उभी करून गव्हर्नमेंटानी आपली इच्छा पुरवून घेऊन जबरीने राजाची अब्रू घेऊन सिंहासनावरून काढून त्यास त्याच्या मुलखातून हाकून द्यावे आणि राज्य घ्यावे हीच गव्हर्नमेंटाची इच्छा होती. यांत दुसरा मतलब कोणता हें तुम्ही सांगा बरे? अशी कामे केली. परंतु त्यासमयी राजानी वकील लंडणास पाठवून आपला मजकूर समजावून फिर्याद करण्याविषयी सामर्थ्य करून जोरही केला नव्हता. पहा. क. ओव्हन्स याजकडे खराब तरकटी मनुष्ये बहुत यावयास लागली. तेव्हा अमलदारांनी अशा लोकांचा संग्रह करून मोठा जमाव केला. परंतु ते कोण म्हणाल तरी तेच या तरकटी फितुराचे मूळ आहेत. नंतर दुसरा फितुर तरकटी महाराज छत्रपति याजवर उभा केला. ते सदरहू पहिले प्रमाणेच महाराजास न कळविता पाठीमागे, तरकट समजून तयारी करून कसे बनविले ते पहा. दोन मॅनुएल द पोर्तुगाल इकास्त्रो ही केवळ लहान दरिद्री अशी एक जागा पोर्तुगीज याची आहे. आणि ते अशक्त व सामर्थ्यहीन आहेत. आणखी ही जागा मुंबई पासून दोनशे मैल म्हणजे सुमारे शंभर कोस.
अशा या लहान जाग्यांत हे पोर्तुगीज गव्हर्नर होते. त्याशी सातारचे राजे फितूर करीत होते. ते हा फितुराचा मजकूर असा सांगतात की. तीस हजार फौज फ्रेंच व पोर्तुगीज मिळून ही फौज विलायतेहून जमा करून रूस व तुर्कस्थानासह या फौजा हिंदुस्थानांत आणवून या फौजेपासून इंग्रजी लोकांस हिंदुस्तानांतून हांकून द्यावे! हे आश्चर्य आहे. हे तुफान अगदी खोटे दुष्ट विनोदी थट्टेप्रमाणे उभे करून त्यात मूर्ख बेवकूफ खराब साक्षी जमा केल्या. ही पहिले तुफानाप्रमाणेच दुष्ट तरकटी खोटी लबाड बेअब्रूची मनुष्ये आहेत. आणखीहि ऐका. त्यात कित्येक चोराचे टोलीपैकीच आहेत. हे चोर चौकशीचे नांव घेताच पळून गेले. अशा मनुष्यांच्या साक्षी जरूर घ्याव्या म्हणोन मुंबई गव्हर्नमेंटानी शर्तीनशी कबूल केले आहे की, तुम्ही महाराजावर साक्षी घ्याव्या म्हणजे तुमचे गुन्हे बशर्त मुंबई गव्हर्नमेंटातून माफ होतील.
असे वचन देऊन ठरावून सांगून नंतर या साक्षी लिहून घेतल्या. त्या साक्षी (दारां) शीच कागदांचे गाठोड्यात हे खोटे कागद होते आणि हेच ओव्हन्स याणी घेतले. परंतु या कागदांवर खोट्या सह्या. असे सारे बनविलेलेच आहेत. हे मोठे आश्चर्य आहे ते तुम्ही ऐका. याच फितुरी खोट्या कागदांवर हे खोटे शिक्के नवे करून तेच हे खोटे शिक्केही याच कागदावर केलेले बजिनस आहेत. आणि हे एका खेड्यात आणि एका वाण्याचे घरीं हेच कागद गहाण एका हलक्या खराब माणसानी पोर्तुगीज याचे मुलखात दोन्ही तर्फेचे ठेविले होते. तेच हे खोटे दोन्ही तर्फेचे कागद हलवाया कडून मिळाले म्हणून सांगतात. परंतु भी विचारितो या खोट्या कागदांस व खोट्या शिक्क्यास कोणी एक पैसा तरी देईल की काय सांगा बरे?
आणखी सदरहू खोट्या शिक्क्यांचे खोटे फितुरी कागद असता हेच मुंबई गव्हर्नमेंटानी अगत्यानी घेऊन खातरजमेनी सांगितले की, सदरहू या साक्षी आमच्या विचारात सातारचे राजास आपले गुन्ह्यात आणण्यास हे फार उपयोगी प्रकर्ण आहे. आणखीहि हेच कागद व शिक्के कदाचित जरी खरे असते तरी हरकोणतेहि वेळेस या कागदाच्या धण्यास जन्मजन्मापावेतो धनवान करिते की नाही सांगा बरे? आणि हेच खोटे फितुरी कागद व खोटे बनविलेले शिक्के क. ओव्हन्स रेसिडेंट याणी चाळीस पौंड म्हणजे चारशे रुपये जलदीने देऊन गहाणवट होते ते सोडून घेतले. आश्चर्य आणखीहि ऐका. हे कागद अशा कृतीचे महान भगिरथ प्रयत्नानी या रेसिदंटास मिळाल! त्यात काही पोर्तुगीज लिपीचेहि आहेत म्हणतात आणि सांगतात की, दोन मॅन्युएल पोर्तुगाल इकास्त्रो हे गोवे गव्हर्नर, याचे सहीचे कागद आहेत म्हणोन सबब दाखवितात. आणि हाच या फितुराचा मोठा मुद्दा आहे म्हणतात. त्याजवरून तुम्ही आपले मनांत सहजी आणाल की, हे खरे असेल आणि सहजी अंदेशा येण्यास फारशी मेहेनतहि नाही. परंतु खरे खोटे पहा.
इंग्रजी गव्हर्नमेंटाची हुकमत उभय ठिकाणी म्हणजे लंडन प्रांतीच हिंदुस्थानांत आहे. त्याणी महाराज छत्रपतीचे अंगावर फितुरी तुफान घालून हे नांव उभे केले. ते कोण म्हणाल तरी ते पहा बरे. जे पुरातन, अत्यंत स्नेही, इंग्रज लोकांचे मदतगार, त्याजवरून पोर्तुगीज गव्हर्नमेंटास सूचना करून मुंबई गव्हर्नमेंटानी मतलब करून हा दुसरा फितूर करणारे कोण? तरी जे दोस्त पुराणे पोर्तुगीज गव्हर्नर याचे नांव करून या फितुराच्या कामाची चाल जनात दाखवून शिस्त ठेवावी म्हणजे उपयोग होईल; आणि ते दोस्त आपले गळाहि पडणार नाहीत. आणखी येविषयी पोर्तुगीज गव्हर्नमेंटाशी इंग्रजी गव्हर्नमेंटानी काही चौकशी केली? नाही. आणखी पहा. कागदपत्र लिहून खरे खोटे काही विचारिले? नाही. तेव्हां मी हा मतलब सांगतो तो कसा तोच तुम्ही पहा. आणि हे काम या साक्षीसह फार अयोग्य.
त्याविषयी मी स्पष्ट सांगतो की, हे कागद गोवे गव्हर्नर याचे स्वदस्तुरचे सहीचे आहेत म्हणतात! हेच पोर्तुगीज अस्सल कागद बजिनस मुंबई गव्हर्नमेंटाचे हातात आहेत. या कागदात फितूर केला म्हणोन लिहिले आहे. तो कसा की. इंग्रजी गव्हर्नमेंटाची हुकमत सारी घेऊन हिंदूस्थानातून इंग्रेजास अगदी काढून घालवून द्यावे. सदरहूची इंग्रजी गव्हर्नमेंटानी का चौकशी केली नाही? या फितुराचा पत्ता पाहून काही शोध करणे का केले नाही? अथवा पोर्तुगीज गव्हर्नमेंटास या फितुराबद्दल जाबसाल विचारणे किंवा खरे खोटे पुरी चौकशी करणे हेहि आजपावेतो काही एक केले नाही. परंतु पहा. या फितुराचे गुन्हयावरून राजास काढिले कैदेत ठेविले, सर्वस्व तसनस केली, इजा दिली.
त्यास हे पोर्तुगीज गव्हर्नमेंटहि या फितुराच्या गुन्हयांत आले असतां काही विचारणे अगर तजवीज करणे हे काही केले? नाही. येविषयी त्यास न विचारण्याचे कारण सांगतो पहा. हा फितूर समूळ खोटा हे उघड प्रसिद्ध जनजाहीर आहे. आणि या फितुराप्रकरणी लंडन मुक्कामी मोठा पुकारा होऊन मुलखोमुलखी बातम्या कळल्या. त्यांत जेव्हा दोन मॅन्युएल गोवे गव्हर्नर याणी या फितुराचा मजकूर ऐकिला, तेव्हां त्याणी सदरहू विषयीची गोष्ट साफ जाहीर करून सांगितले आहे की, "या फितुराचे तुफान खोटे आहे." आणि जो मजकूर वास्तविक खरा होता तो जोसेफ ह्यूम एस्कायर मेंबर ब्रिटीश पार्लमेंट याजकडे आपले दिलखुलाशानी पत्र लिहून पाठवून सर्व वृत्तांत दोन मॅन्युएल याणी जाहीर केला. तोच मजकूर तुम्हां सर्वत्रास समजावितो. हे दोन मॅन्युएल पोर्तुगाल इकास्त्रो हल्ली लिस्बन पोर्तुगीज यांच्या शहरांत आहेत. त्यांनी हे पत्र साक्षीनशी पाठविले ते पहा-
लिस्बन, ता. २५ एप्रिल १८४१
आमचे अब्रूने आणि खरेपणानी आमचे अब्रूचे स्वच्छतेकरितां इनसाफाचे पुरवणीबद्दल आम्ही अगत्य सांगतो की, ज्या वेळेपासून आम्ही हिंदूस्थानांत पोर्तुगीज यांच्या महाली मुलखी गोव्याचे गव्हर्नरीवर होतो, त्यास प्रथम पासून अखेर वेळेपावेतो सातारचे राजाचे कागद आम्हास अगर आमचा कागद राजास तेथे आम्ही हुकमत केली तेव्हां कधी राजकारणी फितुरी कामाबद्दल आम्ही लिहून पाठविला नाही. सातारचे राजाचाहि आम्हांच आला नाही. व परस्परे बोलणे भाषणहि जाहाले नाही. असे असतां आमचे सहीचे जे काही दस्तैवजी कागद-पत्र राजकारणाविषयी छापून जाहीर जाहाले आहेत ते सारे खोटे व लबाड आहेत.
सही. दोन मॅन्युएल पोर्तुगाल इकास्त्रो
ह्यूम, एस्कायर, मेंबर, ब्रिटीश पार्लमेंट यांस
या फितुराचे काम उभे करणाराच्या खरेपणाच्या सत्याविषयी हा या तरकटाचा दस्तवजी मुद्दा आहे. हा त्याचा खरेपणा मानण्यासाठी तुम्ही एवढे घ्यावे. या मुंबई गव्हर्नमेंटाचे फितुरी व खोटे तरकटी व दगेखोरी व कुतर्की व अब्रूहीन हा मजकूर त्यांच्याच दस्तैवजावरून जनजाहीर जाहाला आहे. तरी हे इतके मुद्दे त्यांचे अंगी शाबूत जाहाले असता, सातारचे महाराज छत्रपतीस फितुरी सदरहू सबबीवरून ठरवून याच कलमाचे निमित्य जबरीने ठेवून राजास सख्त इजा दिली तेच हे काम आहे. ते तुम्ही नजरेस आणा, आणि कोठे आहे फितुर तो सांगा?
तिसरे व शेवटच्या फितुराचे तरकट गुप्तरूपे करूनच महाराजावर उभे केले. तेहि त्या दोन फितुराप्रमाणेच आहे. त्या दोन्ही कलमाचा मजकूर पेंशजी मी सर्वांस समजाविलाच आहे. राजाचे अंगावर दुसरे फितुराचे तुफानी तरकट उभे केले ते कोणाशी व कोणाचे नावानी म्हणाल, तरी फिरंगी गोरे विलायती गव्हर्नराशी नाही. परंतु पहा. हे नागपूरचे राजे जे का पेशजी आपल्या राज्यावरून गेले आहेत आणि हे महाराज -छत्रपतीचे जुने चाकर आहेत. त्याशी सातारचे राजानी फितूर चालविला होता. म्हणतात की इंग्रज लोकास हिंदुस्थानांतून काढून घालवून द्यावे. परंतु पहा राजाचा कोणता काय अन्याय व गव्हर्नमेंटाचे दिलाचा खतरा आणि संशय तो भी मुद्देसूद शाबुतीने दस्तैवज धरून सांगतो की, हे नागपूरचे राजे राज्यावरून काढलेले आणि जे गुप्त राहून आहेत, ते कोणापाशी म्हणाल तरी हे इंग्लीश गव्हर्नमेंटाचेच कैदेत आहेत.
आणखी त्याजपाशी द्रव्य एक रुपयाहि नाही हे जनजाहीर आहे. असे असता त्यानी सातारचे राजाकडे सल्लामसलतीचे पत्र पाठविले म्हणतात आणि सातारचे राजानी या नागपूरचे राजास पायपोस पाठविले म्हणोन सांगतात. परंतु मजकुराविषयीची अगदी काही शाबुती नाही. असे असता या गव्हर्नमेंटानी मतलबानी तरकट करून याच तुफानावरून महाराज छत्रपती सातारा यास फितुरी ठरवून मोठी सख्त इजा दिली आहे.
पहा सातारचे राजावर हीच फितुराची तुफाने तरंकटे उभी केली आहेत. महाराज छत्रपती मुंबई गव्हर्नमेंटानी या फितुराचा मजकूर सांगितला होता किंवा नाही? अथवा महाराजापाशी सदरहू विषयीची पुरावा करण्याबद्दल काही उत्तरे मागितली किंवा नाही? हा फितुर महाराज तुम्ही केला आहे किंवा नाही हे विचारले? नाही. फितुरी मोकदम्याच्या कागदाच्या नकला राजास दिल्या किंवा नाही? नाही, नाही, नाही. आणखी महाराज तुम्ही फितूर केले ते अमके अमके आहेत म्हणून या गव्हरमेंटानी सांगितले किंवा नाही? नाही. अगर महाराज छत्रपतीचे सन्मुख पुढे या साक्षी उभ्या करून चौकशी केली किंवा नाही? नाही हो नाही. सदरहू जे काही पक्के मजबुदीने काम मुंबई गव्हर्नमेंटानी केले होते तेच हे आहे. म्हणजे जेव्हा महाराजांची साक्ष नुसती एका कलमाची घेतली परंतु त्या कागदास गुप्त म्हणजे सिक्रेट कमिशन यानी ज्या साक्षीदारांपासून जबान्या लिहून होत्या त्याच्या नकला मराठी भाषेत लिहून द्याव्या म्हणून महाराज छत्रपतीने सांगून नकला मागितल्या, त्या कमिशन यानी महाराष्ट्र भाषेत नकला देतो म्हणोन वायदा मुदत केली होती.
या साक्षीदारांच्या जबान्या कोणत्या भाषेत घेतल्या होत्या त्या तरी ऐका. मराठी भाषेत? नाही. या साक्षीदाराच्या जबान्या दुसऱ्या लिपीत परभाषेत घेतल्या होत्या. ती परभाषा कोणती तुम्ही म्हणाल तरी ती भाषा इंग्रजी. पहा मी विचारतो महाराज छत्रपतीचे राज्याचे मुलुखांत इंग्रजी भाषेचे लिपीनी जबान्या घेण्याचा शिरस्ता आहे? नाही. पहा सिक्रेट म्हणजे चोरटे कमिशन, याने महाराजांस उत्तर केले की या मोकदम्याच्या साक्षी सिक्रेट म्हणजे चोरट्या गुप्त आहेत म्हणोन सांगितले. पहा पार्लमेंटरी बुकाचे पान ३६७ कलम ५.
महाराजावर हा फितूर जनजाहीर उभा केला आणि त्या साक्षी गुप्त म्हणतात. हे तरकट कसे सांगा बरे? या साक्षी व यांच्या जबान्या हे गुप्त का बरे ठेवितात? महाराजांस राज्यावरून काढिले हे गुप्त आहे? जगप्रसिद्ध आहे. या चोरट्या कमिशनचा मतलब तरी पहा. हे सारे खोटे तरकट तरकट. सबब समजून उमजून हे खराब काम केले. आणि सदरहू विषयीचा मजकूर महाराज छत्रपतीस काही एक अक्षरमात्र समजाविले नाही व हा मजकूर अगदी माहित नाही! हे मोठे आश्चर्य आहे.
पहा जे काही काम केले ते प्रगटपणे महाराजास फितुरी ठरवून सख्त इजा दिली त्या विषयीचा सदरहु मजकुर आहे. त्यास अशा तरकटांवरून सहजीच मुंबई गव्हरमेंटाचे अंगावर फितुर केल्याचा मुद्दा लागला. तेव्हां राजास हरएक हिंमतीने पंचांत आणिले. त्याजवरून या गव्हर्नमेंटाचे अन्यायाचा दोष अंगास लागला नाही. हे हिंदूस्थानांत व विलायतेत सारे फिरंगीस्थान प्रांती मषहूर जाहाले की सातारचे राजे फितुरी अन्यायदार ठरविले, ते कोणते कोणते फितूर म्हणाल तरी जे मी पूर्वी समजाविले तेच हे असे जेव्हां काम केले तेव्हा या मुंबई गव्हर्नमेंटानी जे जे फितूर केले होते ते ते सारे अंगावरील निघून जाऊन या मोठ्या पराक्रमानी बेअब्रूचे कामापासून मुंबई गव्हर्नमेंटाची सुटका जाहली. तेच हे काम हल्ली समजावितो. हे कसे व कोणत्या रीतीचे आणि किती अब्रूचे आहे ते तुम्ही नजरेत आणा.
सर रॉबर्ट अँट माजी गव्हर्नर हे खुणेचे कागद गुप्त लिहिणारे, आणि जनरल लाडउइक याजकडे गुप्त पाठविणारे आणि हेच ग्रँट फितुरी तुफाने उभे करणारे. हा मुख्य एकनिष्ठ तरकटी होता. तो मेला, नंतर सर जेम्स कारनेक हा कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स यांचे चेअरमन होता. तो मुंबई गव्हर्नर होऊन त्याच्या जाग्यावर गेला. त्यासमयीचा मजकूर तुम्ही ऐका. सर जेम्स कारनेक लंडणाहून हिंदूस्थानांत जाण्याच पूर्वी सर चार्लस फोर्बस वारोनेट यासी कारनॅक बोलले ते त्याचे बोलणे तुम्हास हल्ली मी सांगतो, ते हे बोलणे सर चार्लस फोर्बस कोर्ट (ऑफ) प्रोप्रायटर्समध्ये ईस्ट इंडिया हौसांत ता. १२ फेब्रुवारी सन १८४० रोजी कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स यांस सांगितले की, "या फितुराधे तुफानाबद्दल या नवे गव्हर्नरांचे साफ दिला विचार कसा होता तो तुम्ही ऐका. सर जेम्स कारनॅक यांनी मला सांगितले की, या मोकदम्याचा बंदोबस्त मी पांच मिनिटांत करीन अशी माझी खातरजमा आहे. आणि हे तुफान जसे सातारच्या राजावर बनावून उभे केले आहे त्यासारिखेच पेशजी बडोदेकरांवर जाहाले होते. ते त्याचप्रमाणे हे आहे. जेव्हां आम्ही ऐकले तेव्हांच समजलो. पूर्वी आम्ही बडोद्यांचे दरबारात रेसिदंटीवर होतो तेव्हां अशा तुफानावरून कित्येक वेळी आम्ही गायकवाड काढणे माफक अशीच होती. परंतु त्यास काढले नाही."
तेव्हा असे सहजीव दिसण्यात येते की सर जेम्स कारनॅक लंडणाहून मुंबईस जाण्यापूर्वीच या फितुराच्या खोट्या तुफानास माहितगार होते. आणखी तेव्हा हे तरकट अगदीच कबूलहि करीत नव्हते. परंतु लंडणाहून त्यांची रवानगी हिंदूस्थानात होऊन मुंबईस जाऊन पोहोचण्याचे मधी काही नवे साक्षीदार फितूर प्रकरणी वगैरे काहीच मिळाले नव्हते. जी पेशजी महाराज छत्रपतीवर फितुरी तरकटे जी जी गुप्त कृतीनी उभी केली तीच सारी जुनीच तरकटे होती. परंतु पहा, मुंबईत जाताच प्रथम ज्या पुरुषांच्या भेटी जाहाल्या ते दोघे कसे प्रकारचे इमानदार व मसलतदार कोण होते म्हणाल तरी ते पहा.
मि. अंडरसन व मि. उल्बी या उभयताचे मदतीने सर जेम्स कारनॅक यानी मोठ्या जलदीने एक कागद कलमबंदीचा लिहिला. त्या कागदात पूर्वीची एक कथा तरकटी होती तिचा आरंभ केला आणि तेच कागद घेऊन आपले दोघे मसलतदारासह सातारियास गेले.
हे कशासाठी गेले आणि याचा उद्देश मतलब काय होता म्हणाल तरी सातारच्या राजाच्या मोकदम्याची समाप्ती करावी, म्हणोन हे मुद्दाम जाऊन त्याणी राजास काय सांगितले तेच पहा. परंतु हे विनाकारण सांगितले नाही. कारण त्यांच्या मनात हे कृत्रिम राजास दगा करण्याचे होते. या गव्हर्नरानी महाराज छत्रपतीस बोलावणे पाठविले. तेचक्षणी छत्रपती येऊन गव्हर्नरास भेटले. तेव्हा सर जेम्स कारनॅक यानी अंडरसन व ओव्हन्स यांच्या समक्ष सदरहू तरकट कथेचे आरंभाचा कागद राजास वाचून दाखविला आणि महाराज छत्रपतीस कारनॅक यानी सांगितले की, महाराज तुम्ही या कागदावर सही करून द्यावी. परंतु पहा, त्याच्या बोलण्यातील मजकुराचा असा प्रारंभ केला होता की महाराजानी फितूर केले म्हणून कबूल करून लिहून द्यावे.
आणखी पहा. मोठ्या जोरानी महाराज छत्रपतीपाशी या फितुराचे तरकटाची कबुलायत लिहून मागितली. परंतु हे तरकटी आणि कृत्रिम सांगणे बोलणे महाराज छत्रपतीस कारनॅक याने सांगितले की, तुम्ही फितूर केले म्हणून कबूल होऊन आम्ही सांगतो त्या प्रमाणे आम्हास लिहून देऊन, नंतर महाराजानी आपले सिंहासनाचे राज्यावर कायम निरंतर रहावे. तेव्हा ही गोष्ट अनाहुत छत्रपतीनी एकून फार आस्चर्य वाटून मोठा अर्चना होऊन संकट प्राप्त जाहाले, पुन्हा या अर्थव्यापासून सावध होऊन महाराज छत्रपती कारनेक गव्हर्नरास उत्तर केले की आम्ही फितुर केला नाही. आणि तुमचे सांगण्यावरून आम्ही या खोट्या कागदावर सही करणार नाही. तो हा मजकूर हल्ली मी तुम्हास समजावितो. परंतु तुम्ही म्हणाल की हा तुमचे तोंडचा बोलण्याचा आहे, तरी तसे नाही. ज्या प्रमाणे सर जेम्स कारक यानी आपले पत्रांत मजकूर मजकूर लिहून पाठवून जनजाहीर आपले घण्यास खबर दिली तेच बजिनस मुद्देसूद दस्तवज छापील तुम्ही पहा-
सर जेम्स म्हणतात, जेव्हा आम्ही तो कागद वाचण्याची समाप्ती केली त्या समयी त्याणी म्हणजे महाराजानी आम्हांस सांगितले की, आम्ही तुम्हांस स्नेही शुभइच्छावंत गव्हर्नमेंटास निरंतर लेखून मोठे भरवशाचे पुरे दोस्त आहां असेच आम्ही समजतो व मानतो. आणखी महाराजानी आम्हांस म्हणजे कारनॅक यास सांगितले की, आम्हावर ही फितूरी तुफाने आमचे दुष्मानांच्या समजावण्यावरून तरकटे उभी केली आहेत. असे असता आम्ही गव्हर्नमेंटाचे दुष्मान आहों असें जे तुम्ही आपले दिलांत आणिले आहे आणि बोलता हें सारे व्यर्थ आहे. तत्रापि आम्ही तुमची द्वेष भावना चित्तांत बाळगतो म्हणता, सबब तुमचे दिलाची साफी होई तोपावेतो आम्हास तुमचे सांगण्याप्रमाणे कोणतीच गोष्ट कबूल करवत नाही. कारणं सदरहू तुफानाचा इन्साफ होऊन येविषयींची निमित्ये दूर जाहल्यानंतर तुम्ही आम्हांस ज्या गोष्टी काही सांगाल त्या कबूल होतील. परंतु त्यापैकी आम्ही कधींहि कबूल करणार नाही, त्या कोणत्या गोष्टी म्हणाल आणि विचाराल तरी पहा.
आम्ही आपला धर्म सोडणार नाही, व आम्हीं फितुर करून तुमची दुष्मानी केली म्हणतां त्यास हे खोटे कबूल करणार नाहीं. बाकी जे सांगाल ते कबूल होईल. पण महाराजांनी कारनॅक यास विचारले की, "तुम्ही आम्हास तहनामा तोडिला म्हणता त्यास आम्ही काय काय केले आहे ते सांगा?" तेव्हां कारनॅक माजी गव्हर्नर मुंबई यानी उत्तर केले की, तुम्हीं नागपूरचे काढलेले राजाशी फितूर केला. त्या राजाचे अस्सल कागद इंग्रजी गव्हर्नमेंटाचे हाती सापडले आहेत. आणखी कास्नॅक यानी महाराजास सांगितले की, हे कागद नागपूराहून गेलेले राजानी सातारयास महाराजाकडे पाठविले ही गोष्ट खरी शाबित जाहली आहे. असे असता तुम्ही म्हणजे महाराज नाही म्हणतात. तेव्हां महाराज छत्रपतीनी त्यास उत्तर केले की, कोणी एखाद्यानी कोणाकडे कागद पाठविला, परंतु ज्यास पाठविला त्यास जर माहित नसल्यास तो उत्तर काय सांगेल?
तसे आम्हास माहित नाही, त्याचे उत्तर काय सांगावे? आणि अशावरून कोणी अन्यायदारहि शाबूत होत नाही आणि त्यास आमचे उत्तर कोठे आहे ते तुम्हीं दाखवावे. मि. अंडरसन येथे आहे आणि तिकडून त्याजकडे कोणी कदाचित् कागद पाठविला आणि त्यास माहित नाही, तर अंडरसन उत्तर काय सांगतील? अगर त्यानी उत्तर दिले असल्यास ते कोठे आहे? तसे यास काय दाखला आहे? तेव्हां हे शाबूत होत नाही. अगर हे कागदपत्र यद्यपि घेण्यामध्ये हा काही दोष व गुन्हा इकडे लागू होत नाही. (पार्ल. बु. १ पान २६८).
सदरहू कागदपत्राविषयी सर जेम्स कारनॅक मोठा सख्त जोर ठेवून राजाशी बोलले. परंतु हे मोठे आश्चर्याचे काम आहे. या कारनॅकच्या हाती सदरहू कागद आहेत. हे कागद खोटे बनवून घेतले. आणि याजवर सहीहि खोटी बनावून तयार करून तरकट केलेले आहे. असे पुरे दस्तैवजी मुद्यापत्यानिशी शाबूत झालेले आहे पहा राघोबा ऊर्फ राघों गोपाल दाडसाखल (?) (पार्लमेंटरी दुसऱ्या बुकाची पाने ८६९, ८८१ व ८८२ पहा.) या खोट्या कागदात नाव राम्रो गोपाळ कारकुन लिहीले आणि जबानीत राघो गोपाळ दाडसाखळ व दुसरे ठिकाणी राघोपंत कारकुन. परंतु याचे खरे नाव राघोबा भट. या साक्षीदारानी अर्जी ता. २४ एप्रिल सन १८४० इ. रोजी लिहून त्याला म्हणजे कारनॅक यास दिली. तेवेळी हेच कारनॅक मुंबईचे गव्हर्नरीवर होते.
परंतु चौकशी केली नाही. कारनॅक म्हणतात हे कागद नागपुरचे राजापासून आले ते आमचे पाशी आहेत सांगतात. परंतु या कागदास जो साक्षीदार या कारनॅक याचा तोच हे कागद खोटे म्हणोन अर्जी करितो. आणि मीहि साफ सांगतो खोटे अगदी खोटे. महाराज छत्रपतीचा नाश करण्याच्या इच्छेनी हे तरकटी मनुष्यापासून खोटे बनावून घेतले. तेच मुद्दाम मुंबई गव्हर्नमेंटाचे हातांत नीट आले. यासच कारनॅक म्हणतात हे कागद खरे आहेत. परंतु दस्तैवजी व साक्षीनिशीं हे कागद खोटे आहेत; आणखी हे कागद महाराजाचे हातांत कधीहि नव्हते.
महाराज छत्रपतीस पेचांत आणण्याबद्दल जे गव्हर्नमेंटानी फितूर केले ते सदरी तपशीलवार लिहिले गेले ते पहा. हे मुंबई गव्हर्नमेंटाचे काम. प्रथम फलटणचे सिपाई. याजकडून फितूर केला. दुसरा बाळकोबा केळकर याजकडून गोव्याचा फितूर उभा केला. तिसरा फितूर नागपूरकराचा केला. एकूण तिन्हीहि फितूर खोटे. येविषयी दस्तैवजी कागद छापिले ते जनरल लॉडउइक रेसिदंट सातारा, दुसरे क. ओव्हन्स रेसिदंट सातारा, तिसरे मुंबई गव्हर्नमेंट, चवथे गव्हर्नर जनरल (ऑफ) इंडिया, पांचवे कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स वगैरे, सहावे प्रोप्रायटर्स, सातवे पार्लमेंट, अखेर ता. १२ दिसंबर सन १८४४ छत्रपति सरकारचे पत्र गव्हर्नर जनरल यांस, नववे मेजर कारपेंटर एजंट बनारस यांचे पत्र ता. २५ मे सन १८४६. पैकी कलम ४ यांत साफ लिहितात राजाकडे फितुराचा नाही. पहा कोर्ट व गव्हर्नर जनरल यांची पत्रे (त्यावरून) हा फितूर मुंबई गव्हर्नमेंटानी करून तरकट केले हे बजिनस जनजाहीर आहे.
लंडन ता. १३ जून १८३८ इसवी.
आमचे गव्हर्नर जनरल इन कौंसिल.
ता. ६ जानेवारी सन १८३८ नं. १
या पत्रांत आम्हांस मजकूर लिहून समजावितात की, सातारचे राजावर मूळ अस्सल फितुरी तुफानाविषयीचा वहीम घरून जे मुंबई गव्हर्नमेंटानी आपले मनात आणून अगत्यानी या कामात पडून जी तजवीज केली ती फार लांब आणि मोठे विस्तीर्ण प्रकर्ण वाढवून हे काम चालविले, त्याजवरून गव्हर्नर जनरल यांच्या चित्तास फार खेद होऊन लिहून कळवितात की या मोकदम्याचे काम जलद शेवटास लावून सुप्रीम गव्हर्नमेंटाचे नजरे समोर आणण्याची जितकी जलदी होईल तितके निकडीने महकूब करून समजावे.
सदरहू विषयी आमची इच्छा फार आहे की या मोकदम्यावर तुम्ही नजर ठेवून जेवढे लौकर होईल तितके करून हे काम जलदीने आटोपून घ्यावे. सबब आम्ही भरवसा धरून तुम्हास हे पत्र लिहून कळवितों की सदरहू विषयी विलंब न लागू देता या कामाचा निकाल करून आम्हाकडे लिहून पाठवावे. या विषयी जोपावेतो तुमचे नजरेची सला आमचे हातात येईल तोपावेतो आम्ही आमचे नजरेस महकुब करितो. आणि आता या वेळेस आमचे बुद्धीने खचित चित्तांत आले आहे की या मोकदम्यात पुन्हा तजवीज करणे हात घालणे हे नुस्ता वेळ गमावणे, त्यापेक्षा हे काम महकूब करावे. कारण या कामावरून आपले हुकुमतीस व राजकारणाचे अब्रूस आपली भारी नुकसानी होईल.
सही. जे. एल. लिस्टन, चेअरमन,
ए. जेंकीन्स, डेपुटी चेअरमन, वगैरे
पहा, मुंबई गव्हर्नमेंटानी छत्रपतीवर सदरहू तरकटी खोटे फितूर उभे केले येविषयी बजिनस गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑक्लंड व कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्सहि कबूल करीत नाहीत. परंतु पहा, मुंबई गव्हर्नमेंटानी तरकट करण्याचे मूळ. महाराज छत्रपती सरकारांतून याद लॉडउइक रेसिदंटाकडे पाठविली की जहागिरदार प्रकरणी मुंबई गव्हर्नमेंटातून बंदोबस्त होत नाही व याविषयी उत्तरहि येत नाही सबब आम्ही वकील लंडणास कोर्टाकडे पाठविण्याची योजना करून याद ता. १६ जून सन १८३६ (पार्ल. पा. ५५३) तयार केली.
हे वर्तमान कळतांच मुंबई गव्हर्नमेंटानी द्वेष करून राजावर फितुराचे तुफान सुमारे एक महिन्यांत उभे करून ता. २१ जुलै सन १८३६ पासून ता. १३ जून सन १८३८ एकूण पावणेदोन वर्षे दोन महिने पावेतो या खोट्या फितुराचे काम चालविले. त्याजवरून कोर्ट सदरहू पत्रांत साफ लिहितात की या कामावरून आपले अब्रूची भारी नुकसानी होईल. नंतर पुन्हा कोर्ट [ऑफ] डिरेक्टर्स यानी पावणेसात महिन्यानी लिहिले ते कलम ३ पहा-
ता. २२ जानेवारी सन १८३९- या वेळी आमचे नजरेत येऊन तुम्हांस सूचना करितो की पेशजी ता. १३ जून सन १८३८ [नं. ३९] कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स यानी आपले संमत देऊन तुम्हांस पत्र लिहिले गेले आहे ते हल्ली फिरविण्याजोगे काही एक जरूरीचे कारण दिसत नाही. सबब जे जे पेशजी लिहिले गेले आहे तेच मुकरार होऊन कबूल आहे.
आणखी पहा. या पत्रा अलीकडे गव्हर्नर जनरल लॉड ऑक्लंड यानी सुमारे सहा सव्वासाहा महिन्यानंतर मुंबई गव्हर्नमेंटास पत्र तारिख ३१ जून १८३९ रोजी लिहिले त्यांतील कलम ३
"मोकदम्याचे कामाचे चालीबद्दल खचित जे करणे आहे ते गव्हर्नर जनरल यानी मुंबई गव्हर्नराचे चित्तांतील सला संमत बरोबर आणि माफीची मसलत जी तुम्ही कबूल केली की महाराजापाशी अशा मागण्यावरून त्यास जसे पारपत्यासारखे होईल ते करावे. परंतु मि. अँडरसन यानी जसे आपले अकलेनी सांगितले की या साक्षीदारांस या करण्यानी पुढे शिक्षा होईल. तहनाम्याविषयी पक्केपणानी मोकदमा मान्यतेविषयी व्हावे व सर्व गोष्टीवरून पेशजी चौकशी जाहाली. आणि ज्या मनुष्यांनी ही प्रथम खबर दिली त्यास जी जामिनकी मागणे हे पक्केपणानी जाहाले पाहिजे. कारण महाराजास त्याजवरून इजा दिली. त्याजबद्दल त्याचा बचाव होण्यास जामिनकी पाहिजे."
पहा हे तरकटी फितुरी चोरास बचवावयाची युक्ति. मुंबई गव्हर्नराचे संमत पत्रांत ता. २० जून सन मजकुरी ची कलमबंदी लिहिली त्यास ती संमते त्याचे बरोबर सोबती मसलतदाराचे सल्लेनी ठरवून कबूल केले. त्यावरून सदरहू विषयी गव्हर्नर जनरल यानी आपले दिलापासून कबूल करतात आणि लक्षांत असे आणून सांगतात की आमचे म्हणजे गव्हर्नर जनरल आमचे नुस्ते कल्पनेनी सांगणे असे आहे की सातारचे राजापाशी लिहून मागण्याच्या पत्राचे लिहिण्यांत मोठी खबरदारी ठेवून बहुत संभाळून जपून युक्तीने करावे. कारण यद्यपि खचित आणि मुकरार करावे म्हणजे तेणेकरून इंग्रजी गव्हर्नमेंटाचे चित्तांत त्याविषयी असे आहे की तो मजकूर त्यास सांगणे. तो जरी होण्याप्रमाणे आहे आणि घडून येईल तरी बरे. परंतु जर म्हणण्याप्रमाणे न जाहल्यास अडचण पडेल. स्वतःचे म्हणजे महाराजाचे आपराधाविषयीचे गुन्हे आहेत अगर नाहीत येविषयी न्यायाने निर्दोष अथवा काही वादविवादिक भाषणे न करावी.
असे कबूल करून घेऊ नये. येविषयी आमचे चित्तांत भ्रांती होत आहे की हे याचे जातीवर घालून अंगिकार करून लिहून मागणे म्हणजे महाराजांचे स्वतःचे अपराधांस शाबुदी करण्याविषयी तुम्ही अतिशय स्पष्ट विचारे करून तुम्ही हा विषय केला की नाही. म्हणजे फार उघडा मजकूर करून दोष ठेऊन बोलावे हे त्यास सांगावे, म्हणजे फितुरीविषयी त्याजवर सामुदी करणे, नंतर नमरोनी पुन्हा कृपा करून दाखविणे ही गोष्ट फार अयोग्य आहे असे सहजातच नजरेस येती किंवा नाही ते खाली लिहिले आहे. कदाचित कोण जाणे इंग्रजी गव्हर्नमेंटाचा हक्क आहे की राजापासून जबाब घेणे, परंतु निर्बल असल्यास न पहाता त्यास या गोष्टीवरून म्हणजे फितुरी अपराधाये काही अंश जे त्यांचे म्हणजे माहाराजांचे अंगी लावणे नसावे. हे त्याच जे मसलतदार असतील त्यांचे अंगावर टाकिले जाते. ते असे की जे त्यांच्या गोष्टी फार ऐकतात. त्याजवर अथवा वकिलाचे अंगावर टाकावे. आणि असे दिसण्यांत यावे की महाराजाचे फार ढिलेपणानी व बेखबरदारीने हे जाहले. परंतु त्याजवर महाराजानी पुरी नजर ठेविली नाही.
पहा या मुंबई गव्हर्नमेंटाचे हाती काही नवा फितूर मिळाला होता? नाही. गव्हर्नर जनरल याच्या हुकूमाअलीकडे तेवीस चोवीस दिवसात जे जुने तरकट तेच मुंबई गव्हर्नमेंटाचे हाती होते. असे असता हा दुष्ट कारनॅक सातारियास जाऊन ता. २३ आगष्ट सन १८३९ रोजी राजास सांगतो की तुम्ही फितूर केला म्हणून लिहून द्यावे. परंतु हे खोटे तरकट, सबब राजानी कबूल केले नाही, तेव्हा सक्त जोर करून ता. ५ सप्टेंबर सन १८३९ रोजी छत्रपतीस सातारियास काढून खोटा जाहीरनामा करितात. यात तीनहि फितुराची कलमे लिहीत नाहीत. दुसरे, नवा तहनामा गव्हर्नर जनरल याचे हुकनामी केला म्हणून मतलबी सबबी लिहितात.
पहा सदरहू खोटे तरकटी काम मुंबई गव्हर्नमेंटानी केले ते कोर्ट व गव्हर्नर जनरल कबूल करीत नाहीत. परंतु हल्ली आश्चर्याची गोष्ट समजावितो पहा. हेच कोर्ट (ऑफ) पैकी काही म्हणतात की मुंबई गव्हर्नमेंटानी हे काम मोठे अब्रूचे केले आहे. परंतु पहा. सदरहू या कोर्टाची अब्रू तुम्ही ध्यानात आणा. आणखी चमत्कार पहा. सातारचे राजानी फितूर केला म्हणून म्हणणारे ते कोण म्हणाल तरी ती नामावली पहा. बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणतात कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स यानी केले ते आम्हांस कबूल आहे, ते खोटे अगर खरे जसे असेल तसे आम्हास कबूल. हे इंग्लीश पातशहाचे वजीर यांची अब्रू पहा. कोर्ट म्हणतात हे काम मुंबई गव्हर्नमेंटानी केले.
याप्रमाणेच गव्हर्नर जनरल म्हणतात. सर रॉबर्ट ग्रँट माजी गव्हर्नर मुंबई हे दाखवितात उल्बी लेक्रेटरी, आणि उल्बी सांगतो ओव्हन्स रेसिदंट, अखेर पहा, या फितुराचा मुद्दा ओव्हन्स रेसिदंट दाखवितात की या तरकटाचा शिरोमणी बालाजी नारायेण नातू.
पहा ना नातूचा पुरावा. खोटे फितुरी कागद व खोटे शिक्के मोर्तब, खोट्या जबान्या व अर्ज्या. दुष्मान, तरकटी, चोर, निमकहराम वगैरे जमावास लांच रुपये देऊन हा फितूर बनविला तो खास याप्रमाणेच आहे, हे इन्साफाचे काम आणि दस्तुर पहा.
पहा पुन्हा भेट जाहली. तेव्हाही बोलणे कारनॅक यांचे होऊन त्यांतही फल पहिल्याप्रमाणेच जाहाले. परंतु पहा महाराज छत्रपतीनी आपले चित्तांत विचार केला की. आम्ही साफ निर्मल असता या खोट्या फितुराच्या तुफानाविषयी त्याच्या म्हणण्याप्रमाणे आपले स्वदस्तुर सहीशिक्क्यानिशी कागद लिहून देणे हे आपले अस ठीक नाही. सबब त्याच्या बोलण्याचा धि:कार करून कधीहि कबूल केले नाही. आणखी महाराज छत्रपती सरकारनी आपले दिलांत आणिले की अशा या कागदावर सही करून देणे यांत आपली प्रतिष्ठा आणि वडिलोपार्जित लौकिक बुडवावा हे एक. दुसरे, कारण नसतां मुंबई गव्हर्नमेंटाचे हाती खोटें लिहून देऊन जो उपद्रव करीत आले तो याजवरून यांचा खरेपणा आहे असे सहजात दिसेल. तिसरें, आम्हास राज्यावर राहावे लिहून द्यावे म्हणतात. परंतु याच गव्हर्नमेंटानी खोटा फितूर उभा करून लिहून मागतात, न लिहून दिले तरी दुसरा विचार करू म्हणतात.
तेव्हा राज्याचे आशेनी जरी लिहून दिले तरी हे आम्हास राज्यावर ठेवितात म्हणणे व्यर्थ आहे. चवथे, हे सारे जनांत प्रगट होऊन त्यास वाटेल की महाराज या गव्हर्नमेंटाचे कृत्रिभावरून पेचात पडले नाहीत. परंतु महाराजानी आपले मुखानी कबूल होऊन लिहून देऊन ही दगेबाजी केली असे सहजात दिसेल. पांचवे आणखी पहा. महाराजानी मोठ्या नम्रतेनी मानसन्मान करून आपले तर्फेचा मजकूर समजून घेण्याविषयी कारनॅक यास सांगितले आणि आपला मोठेपणा एकीकडे ठेऊन मोकदम्याची चौकशी व्हावी सबब इनसाफच मागितला. परंतु आपले थोरपणाची नजर वा काहीएक हरकत या कामाच्या बोलण्यात दाखविली नाही. सहावे, पुन्हाहि सांगितले की आम्ही कोणतेहि खरे चौकशीस जे लोक तर्फदारी करणारे त्याशिवाय अदल इन्साफाचे कचेरीपुढे हजर आहो. याप्रमाणे महाराजानी साफ सांगितले.
सातवे, पुन्हां अखेर महाराज छत्रपती आपला थोरपणा व आपले राज्याचा `कारभार इंग्रजी गव्हर्नमेंटाचे हाती देतो म्हणून सांगितले. आणि आमच्या मोकदम्याचा इन्साफ होऊन उभय सरकारची साफी जाहाल्यावर आमचे राज्य आम्हांस परत द्यावे म्हणोन बोलले. परंतु मुंबई गव्हर्नमेंटानी निष्ठुरपणा करून जबरदस्तीने मोठ्या सख्तीने भाषणे करून इन्साफ करावयाचा नाही म्हणून महाराज छत्रपतीस सांगितले. तेव्हां महाराजांनी आपला लौकिक व खरेपणा रक्षण करण्याबद्दल हे दुर्लोकिकी अप्रतिष्ट काम रद्द करून सत्य खरेपणासाठी आपले राज्य सोडून देण्याचे कबूल केले. जेव्हा महाराजास त्यांच्या स्वतःच्या राज्यांतून मुंबई गव्हर्नमेंटानी काढावयाचे ठरविले, तेव्हा त्या गव्हर्नमेंटाचे हुकुमाप्रमाणे महाराज छत्रपति आपले राज्य सोडून गेले. कारण बेदाद जाहली. सबब पुन्हा इन्साफ मिळण्याबद्दल इस्तकबीलपासून आजचे दिवसापावेतो जी प्रथमपासून बोलणी जाहली तीच कबूल आहेत. बरे असो. आणखी ऐका हो.
महाराजानी गव्हर्नरास सांगितले की तुमची म्हणजे कारनॅक याची जर मर्जी आहे तरी आम्ही येथे या बंगल्यात म्हणजे रेमिटाचे घरी राहू, आणि इन्साफानी आमची निर्मलता जोपावेतो होणार नाही तोपावेतो आम्ही आमच्या राज्यांत पुन्हा येणार नाही. आणखी पहा असे सांगितले असता महाराजांस काढण्याकरिता काही जोर अथवा जबरदस्ती अगर अमर्यादा त्या लोकांनी करण्याचे काहीच प्रयोजन नव्हते. याजवरून पहा. या कारनॅक गव्हर्नरानी एवढेच मात्र महाराजास सांगावयाचे होते की, महाराज तुमचे राज्याचा हल्ली शेवट आहे याजकरिता तुम्ही जावे, असे जर स्थाणी सांगितले असते तरी तेव्हांच महाराजहि विलंब न करता तात्काल जाते. परंतु सदरहू प्रमाणे -कारनेक यानी महाराजास सांगितले? नाही.
पहा, हे बोलणे मुंबई गव्हर्नमेंटनी कबूल केले? नाही तेव्हा या गव्हर्नमेंटाची इच्छा काय होती? आणि ते काय मागत होते? पहा, महाराजानी नम्रतेनी बोलून मानमान्यता ठेऊन चांगले योग्यतेनी तजवीज चालवावी हे मुंबई गव्हर्नमेंटाचे मनोगत आणि असे मागणे नव्हते. कारण महाराजानी गव्हर्नमेंटाची अमर्यादा करून आपला जोर दाखवून त्यांच्या बोलण्याचा धि:कार करून फौजेनिशी सिद्ध होऊन लढावे व बलात्कार करून काम चालवावे हेच गव्हर्नमेंटाचे मागणे होते. परंतु महाराज छत्रपती फार सूश आणि मोठे हुशार बुद्धिवंत दाणा जगप्रख्यात लौकिकवान याणी दुरंदेशा जाणून दिवसानुरुप आपले घर संभाळून कीर्तिचे संरक्षण करून निरंतर चालत आले. आणखी पहा. हे सर्वत्रास जनजाहीर आहे की राज्याचे आरंभापासून मोठ्या मेहनतीने तजवीज करून आपली खाजगी दौलत वाढविली.
तो खजिना सुमारे तीस लाख रुपये जमा होता. तो सारा ऐवज आपले राजवाड्यांत ठेवला होता. त्यापैकी काही खर्च केला नाही व रुप्याची भांडी व सोने जवाहीर व उत्तम उत्तम पोशाख व सरंजाम वगैरे भरून ठेविले होते. याखेरीज सरकारी खजिना वेगळा आणि सदरहू खाजगी हे दोन्ही खजिने वेगळे वेगळे होते. त्याप्रमाणेच महाराजाचे मुख्य राजधानी संस्थान शहर सातारा येथे मोठ मोठे लोक द्रव्यवानहि बहुत होते आणि शहरची अमदानीहि चांगली ठेवली होती. असे संपूर्ण भरलेले होते. हे सर्व या दुष्ट गव्हर्नमेंटाचे नजरेत होते. पहा, महाराजाचे रयत लोकानी जर एक बंदुकीची गोळी कदाचित त्यास मारली असती तरी राजवाडा तत्क्षणी लुटून अनेक प्रकारचे दुष्ट उपद्रव करून सारे शहर लुटून घेतले असते आणि शहरास अग्नि लावून सारे विध्वंस करून तरवार मारून हे गव्हर्नमेंट नाश करण्याबद्दल चाहात होते. याप्रमाणे जर काही निमित्यास मिळाले असते तरी लूट मुकरार करून ही लूट त्यांच्या हाती जाती. आणि हा क. ओव्हन्स रेसिदंट तोच मुख्य फौजेवर हुकुम करणारा कमांडिंग ऑफिसर म्हणजे फौजेचा सरदार यास ओव्हन्स याचा या लुटीत वांटणी आठवा हिस्सा हक्क होता.
सबब तत्क्षणीच शिकारीची वाटणी होती. पहा यास्तव ओव्हन्स याणी आपला नफा व दगेबाजीचा मतलब साधण्याबद्दल मुद्दाम रात्री दोन वाजतां म्हणजे मध्यान रात्रीवर पांच घटका श्रावण वद्य १२ रोजी बुधवार शके १७६१ विकारी नाम संवत्सरे ता. ४ सप्टेंबर १८३९ इ. रोजी रात्रीस दिल चाहून शहरावर चालून घेतले. त्या रात्रीच्या सदरहू घटकेस विलायती गोरे टोपीवाले व शिपाई बहुत जमा करून त्या काळोख्या रात्रीचे समई शहरात चालविले. कारण राजवाडा चोहोंतर्फा घेरून बंदोबस्ताने जप्ती करून घ्यावा असे ओव्हन्स याच्या मनात वाटून रात्रीस जाण्याची मसलत करून सदरहू प्रमाणे केले. आणि हा राजवाडा शहराचे मध्ये आहे. परंतु पहा. त्याच्या लुटीची आशा भंग जाहली. महाराज छत्रपतीच्या राजवाड्यात ओव्हन्स यास येण्याजाण्यास चार प्रहर सारे दिवस दरवाजा उघडा होता.
परंतु या कामास दिवसाचा आला नाही. आणि त्यास येण्याजाण्यास रात्रीस कोणतेहि प्रहरात बंदी कोणीहि करू नये म्हणीन महाराजानी आपले शहरपन्ह्याचे सिपाई लोकास ताकीद करून ठेविली होती. आणखी महाराजानी आपले रयतेशी आणि त्याशी कज्या कफावत लावण्यास अगर काही दगा न व्हावा व आपला बचाव होण्याविषयी व हरकोणी मनुष्यानी त्याशी मारामारी करू नये अगर जखमी अथवा खून न व्हावा व रक्ताचा बुंद जमिनीस पडू न द्यावा म्हणोन ताकीत करून महाराजानी आपली सारी फौज व सरदार यापासून हत्यारे घेऊन व साऱ्या तोफा दारूने भरलेल्या होत्या त्यांतील दारुगोळे काढवून रिकाम्या करून ठेविल्या व दारूखान्यांत जेथे जेथे दारू ठेविली होती त्या दारूत पाणी घालून भिजवून टाकिली. कारण दुष्मान लोक आपल्या फायद्याकरिता अशा संधीत दगलबाजी करून, पुन्हा तेच ही सबब लावून निमित्यास जागा करितील.
याजकरिता सदरी लिहिल्याप्रमाणे महाराजानी पुरा बंदोबस्त करून नंतर महाराजानी आपले चुलत बंधु बलवंतराव राजे भोसले सेनापतीसाहेब स्वार व पायदळ सारे फौजेचे मुख्य सरदार हुकूमतवाले होते, त्यास महाराजानी बोलावून आणून त्याचे हाती तरवार होती ती त्याजपाशी मागताच त्याणी हवाली केली. आणखी महाराजानी सेनापतीस राजवाडयात छटका म्हणजे लाकडाची अथवा कळकाची छडी हातात देऊन वाड्यात रात्रंदिवस रहाण्यास सांगितले. पहा त्या लोकांशी महाराजाचे तर्फेचे लोकानी कोणी जोर अगर तंटा काडीमात्र केला नाही. आणि त्या रात्रीचे समयी हे सारे शहराचे लोक निद्रिस्त होते. परंतु महाराजानी कामदारांस हुकूम करून राजवाडा उघडा ठेवविला. दरवाजासं कुलुपे घातली नाहीत. त्या अशा रात्रीच्या समयांस ओव्हन्स याणीं चित्तापासून मोठ्या संतोषेकरून बहुत जोर करून मध्यरात्रींचे अमलांत फौज जागोजागी पाठविण्याची व्यवस्था बंदोवस्त करून हा ओव्हन्स शहरांत शिरला.
तो राजवाड्यापाशी येऊन दुसरे अमलदार बरोबर घेऊन महाराजांचे वाड्यांतील कचेरीत देवघरापुढे खास खोलीत शिरला. त्यांस तेथे जाण्यायेण्यास कोणीहि हरकत केली नाही. महाराज छत्रपती एकटे आपल्या बिछान्यावर निद्रिस्त होते. पहा, मी तुम्हांस विचारितों, जर महाराजांचे मनांत कपट असतें तर उगीच निसूर अथवा स्वस्थ निर्भय आणि निद्रिस्त राहते? परंतु पहा. कर नाही मग डर कशास पाहिजे? आणखीहि ऐका हे छत्रपती पातशाहा असता यांस अंगावर वस्त्रे घेऊन पोशाख करण्यास काडीमात्र अवकाश दिल्हा नाही आणि त्या निद्रेच्या वस्त्राने छत्रपतीस राजवाड्याच्या पायऱ्याखाली मोठ्या घाईघाईने चालविले. अर्घा म्याना उघडा ठेऊन त्या म्यानांत घालून सातारियापासून एक जागा सुमारे आठ मैल म्हणजे चार कोस होती. त्याठिकाणी पहिले दिवशी राहण्यास जागा महाराजांस दिली ती जागा गाई व बैल बांधण्याचा गुरांचा गोठा होता. अशा जाग्यांत छत्रपतीस ठेविले हे नीट केलें की काय सांगा बरे? (शेम, शेम, शेम.) मीं सदरहू मजकूर तुम्हास समजाविला, या गोष्टीविषयी नामांकित साक्ष ज्या गृहस्थानी प्रत्यक्ष आपले नजरेनी पाहिलें त्यानी पत्र लिहिले, तोच मजकूर समजावितों तो तुम्ही पहा-
महाराजांस राज्यावरून काढिले येविषयींचा मजकूर मी आतां तुम्हांस सांगतो. आम्ही सातारियास फौज सुद्धां ता. ४ सप्टेंबर सन १८३९ रोजी सायंकाली आल्यावर आम्हांस दोन वाजता प्रातःकाली सिपायचि कवायतीचे जाग्यावर रेसिदाचा हुकूम आला त्याजवरून मध्यरात्रीचे समयी आम्ही चालून जाऊन रेसिटावे घरी पोहोचलो. तेव्हा एकदा लोकांस फौज समजून गणती करून नेमणूक करण्याचे तजविजीस त्यावेळी हेच काम करण्यास कठीण अवघड पडले होते. कारण की त्यासमयी काळोखी रात्र आणि फार अंधेर होता. नंतर आम्ही शहरांत शिरलो तेव्हा क. ओव्हन्स व त्याचे सोबती अंमलदार आमच्या पाठीमागे थोडक्या अंतरानी राहून चालत होते. महाराजांचे राजवाडाचे पुढे जाऊन आम्ही फौज सुद्धा तेथे उगीच उभे राहिलो. नंतर के. ओव्हन्स तात्काल एक किंवा दोन अंमलदार सुद्धा राजाचे वाड्यांत शिरले.
थोडक्या वेळानंतर कांही पळांत राजास वाघांतून बाहेर आणून पालखी अगर व्यानांत बसविले. तेव्हा महाराजांचे अंग उघडे होते. निजण्याचा चोळणा मात्र अंगावर होता. त्याशिवाय दुसरे वस्त्र काही नव्हते. आम्ही फौज सुद्धा चालत असतां त्यावेळी मागाहून कोणी माणसानी एक शाल आणून महाराजांचे अंगावर टाकिली. ती मी आपले दृष्टीनी पाहिली. जेव्हां ओव्हन्स यानी महाराजांस बोलविले त्यासमयी महाराज निद्रिस्त होते, असे मला दिसले. आणखी कोणी त्यावेळीच असे सांगितले की हे मोठे आश्चर्याचे वर्तणुकीचे काम केले आहे. परंतु या गोष्टीवरून निश्चये जाणावे की येविषयीचे मजकुराचा लंडन मुक्कामी भारी तंटा पडेल. निंदाचे गावांत राजास नेले म्हणोन कोणी समजतात. परंतु त्या गावांत राजास नेले नाही. त्या गावांपासून कांही अंतरानी येखादे गोरगरीबाचे राहाण्याचे जागेसारखी ती जागा होती. त्याठिकाणी राजास नेले. स्थानभ्रष्ट राजाच्या राहाण्यास ही जागा अगदी चांगली नव्हती. खराब जागा होती.
नंतर थोडे दिवस पुढे आपले राज्याचे चिंतेपासून सुटका व्हावी आणि आपली मनदुःखवेदना सांगितली. हे केवळ जगप्रसिद्ध आहे की राजांस गुरेढोरे बांधण्याचे जाग्यांत थोडे वेळ तेथे ठेविले होते. त्या जाग्यांत उंदिर वगैरे दुष्ट जीव भरलेले होते. अशा त्या खराब जाग्यास राजास ठेविले होते. पहा मला वाटते की महाराजांचे राहण्यास जागा दिली होती ती जागा जशी कोणा एखाद्यास फाशी देण्याबद्दल मांडव करितात तशी ही फार निर्दयेकरूनच कुत्सीत जागा दिली होती. पहा याप्रमाणे कामे करून राजे व नबाब यांस आपले राज्याच्या गादी वरून काढून ईस्ट इंडिया कंपनी आपले मतलब शेवटास नेतात.
पहा या क. ओव्हन्स याची आशा लूट व शिकारीची भंग होऊन गेली. परंतु त्यानी आपले मनांत द्वेषभावनेनी आशा भंग होणार नाही. जी निराशा जाहाली त्याजवरून त्याचा द्वेष अधिक विषाप्रमाणे होऊन व सुरी सारखी धार जास्ती जाहाली. यद्यपि तो म्हणजे ओव्हन्स यानी महाराजांस तीन वेळां आपले इमानानी खरेपणानी सांगितले की, महाराजांचा खासगीचा खजिना व माल व जवाहीर वगैरे परत देण्याविषयी मान्य करून सारे हवाला होईल. रुपये एक एक रूबरु जे काही पाहिजे असेल त्यात काही काडीमर अणुरेणू इतके कभी न करिता महाराजांस परत देवू याप्रमाणे सांगितले असतां त्याने म्हणजे याच ओव्हन्स याने सदरहू खाजगीधी तसनस करून महाराजांस काही एक न देता ओव्हन्स यानी आपल्या फाययाबद्दल अंगिकार न देण्याचा केला अथवा अपहार केला.
हा मनुष्य म्हणजे ओव्हन्स, याचे कर्म म्हणजे जसे कोणी कोणास खुणेनी बोट दाखवितात तसे. या ओव्हन्स याणी दुष्ट कर्मे केली. असा हा माणूस बेअब्रूचा असतो यास गव्हर्नमेंटानी सहाशे पौंड म्हणजे सहा हजार रुपये पहिले दरमहापेक्षा अधिक द्यावे असे ठरवून दिले. पहा सातारचे रेसिदंटीबद्दल सालिना नेमणूक ४००० दर एक पौंडास रुपये १० प्रमाणे एकूण आकार रुपये च्याळीस हजार, याशिवाय सदरहू सहा हजार रुपये इनाम जास्ती या कामाबद्दल तरकटी कामाचे मेहनतीवरून गव्हर्नमेंटातून ओव्हन्स यास मिळाले. परंतु जे पेशजी रेसिदंट होऊन गेले त्यास हे मिळाले नाहीत व ओव्हन्स खेरीजकरून जे पुढे नवे रेसिदंट होतील त्यास हे मिळावयाचे नाहीत, म्हणून मुंबई गव्हर्नमेंट म्हणतात. पहा ओव्हन्स यानी खास दिमतीस राहून महाराजांचे मोकदम्यात मेहनतीने हे बशर्त काम केले सबब हे त्यास मिळाले म्हणून मुंबई गव्हर्नमेंटानी कबूल करून सांगितले.
ज्या कारणाकरितां तो म्हणजे ओव्हन्स सातारियास गेला ते काम संपूर्ण जाहाले म्हणजे महाराजांस आपल्या राज्यातून ओव्हन्स यानी तरकटी खोटे फितूर उभे करून ओव्हन्स यानेच राज्यातून काढीले. सबब ओव्हन्स यास या तरकटी कामाबद्दल हे इनाम बक्षीस दिले. आणखी पहा. ओव्हन्स यांचे सोबती मसलतगार उल्बी यास मुंबई गव्हर्नमेंटाचे कौसिलदार केले. ऐका हो. हा मोठा उत्कृष्ट दर्जा उल्बीस कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स यानी दिल्हा. परंतु पहा या कोर्ट (ऑफ) डिरेक्टर्स यांच्या हाती याहून जास्त दर्जा कोणासही देववत नाही तोच त्यास दिला. या कोर्टाचे हाती दुसरे कोणास कोणत्याहि मनुष्यास देणे ते इनाम बक्षिस व पेन्शन द्यावें इतकीच कुदरत आहे.
महाराजास ज्या जाग्यांत प्रथम कैदेत ठेविले होते तेथे महाराजाची राणी व कुटुंबाची मनुष्ये मागाहून आली. नंतर महाराजांची कन्या सौभाग्यादि संपन्न कनकचुडेमंडित सौ. गोजरासाहेब गरोदर होती. त्यास त्यानी हे मोठे भयंकर महान अरिष्ट पाहून अगदी गर्भगळीत होऊन नऊ महिने पुरे न होता जंगलांत प्रसूत अशा संकटांत जाहाली. तेव्हा मोठ्या संकटानी त्या मुलाचे आईचे जीवाचे संरक्षण ईश्वरानी केले. महाराज छत्रपतीची कन्या चिंताक्रात व भयाभीत होऊन अशी अवस्था जाहाली. बायका व पुरुष गृहस्थ हो, ही तुमचे नांवानी त्या लोकानी अशा प्रकारची कामे केली. परंतु हे काम तुम्हास पसंत होऊन कोणी कबूल करिता की काय? सांगा बरे (नाही नाही. शेम शेम. या समयीं हजारो बायकां पुरूष मोठे क्रोधायमान होऊन, इंग्रजी शब्द मोठमोठ्यानी उच्चार केले, मूर्ख मूर्ख, बेशरम, खराब काम, वगैरे मोठा पुकारा होऊन. कितेक बायकांच्या नेत्रातून पाणी आले, मोठा हाहाकार जाहाला होता. सदरहु मजकुर या प्रांती जनजाहीर आहे.) महाराज छत्रपती सरकारचे नौकर व रयत लोक सुमारे १२०० आपले खुषीने महाराजाचे मागे गेले.
जेथे महाराज कैदेत आहेत ती जागा सातारियापासून सुमारे नऊशे मैल साडेचारशे कोसाच्या अंतरानी आहे. तेथे सदरहू या लोकास महाराज छत्रपतीनी पोटास देऊन त्यांचा सांभाळ करून चालविले आहे. आणखी हे फार उदासी दुःखीत अथवा दिलगिरीने तेथे राजास जाऊन पोहोचण्यास पाच महिने लागले. त्या कूच मुकामाच्या समयी एका मजलीत महाराजाचे भरवश्याचे योवळ स्नेही, हे प्रत्यक्ष चुलतबंधू कैलासवासी सेनापतीसाहेब यांची स्त्री या बाईस स्था चालते मंजलीत प्रसूत कालच्या वेदना कळा लागल्या. त्यासमई महाराज छत्रपतीनी त्या बाईसाठी मुक्काम करण्याबद्दल क्रिष्टल यास सांगितले, परंतु महाराजाचे सांगणे व बोलणे त्यानी निष्ठुरपणानी कबूल केले नाही. परंतु ईश्वरी कृपेनी ती बाई दुसऱ्याच्या मदती व प्रयत्नाशिवाय त्या रानांत चालते रस्त्यात प्रसूत जाहाली. हे काम तुम्ही कबूल करिता? (नाही नाही. शेम शेम, इत्यादि.)
दुसरेहि दुष्ट कर्म मोठ्या आश्चर्याचे काम पहा. सदरहू कूच मुक्कामांच्या चालत्या मजलीत निघोन जात असतां ओव्हन्स रेसिदंट याणी सातारियाहून कित्येक हत्यारबंद सिपाई व स्वारांची टोली पाठविली. हे ओव्हेंन्स याचे हुकुमाचे काम पहा. ते देशत्यागी म्हणजे महाराजाबरोबर बाळासाहेब सेनापति रस्त्यांनी जात असतां या टोलीनी त्यास अडविले आणि ओव्हन्सचा हुकुम असा होता की सेनापतीकडे बहुत हजारो पौंडाचे देणेदाराचे येणे आहे म्हणून खोटी सबब लावून त्याजपाशी ऐवज मागितला. जर सेनापतीनी हा ऐवज न दिला तर या तरकटी टोलीनी सेनापतीस तात्काल कैद करून माघारे सातारियास आणावे. परंतु टोलीची माणसे राजाचे चाकर. ही सेनापतीची हुकुमाखालची माणसे. त्यांसच या ओव्हन्स यानी पाठविले. त्याप्रमाणे ती निमकहराम व तरकटी व दुष्मान खराब माणसे पाठविली.
परंतु पहा बरे, कैद करून पाठविणारा ओव्हन्स आणि हाच तरकटी रेसिदंट वाटेत अडविणार. आणि सेनापतीशी ऐवज आहे अगर नाही हे त्यास माहीत असतां दुःख व इजा देण्याबद्दल हे काम केले. परंतु यात दगेबाजी पहा. हरहुनरेकरून सेनापतीस परत नेऊन कैद करण्यासाठी हिकमत केली. सेनापतीपाशी ऐवज मागितला. परंतु या मागण्यापेक्षां तिप्पट ऐवज मालमत्ता सातारियास या तरकटी दुष्ट ओव्हन्स याच्या हातांत ऐवज मागे राहिला होता. परंतु या मागण्याप्रमाणे देणेदाराचे पुरवणीसाठी या नामदार सरदारानी आपले कुटुंबापाशी जे काही होते ते स्त्रीचे व मुलाचे अंगावरील जवाहीर नगनगोट वगैरे व नोकर लोकापाशी सोन्याची रुप्याची भांडी वगैरे येणेप्रमाणे जबरदस्तीने सारे नागवून घेतले, परंतु पुरावा शाबूत खास आहे की, सेनापतीनी कोणा एकाचे काही एक रुपये हे देणे नव्हते. या संकटाचे थोडे दिवसात हे नामदार मोठे सरदार बेदादीवरून लज्जीत व दुःखीत.
हे मोठे बहादूर सिपाई कोपिष्ट होऊन फार त्याच्या शरीरास क्लेश जाहाले. त्यात या सरदाराची प्रकृति बिघडून अति अवस्थ वाखा जाहाला. म्हणून मुक्काम करण्यास `क्रिष्टल` यास सांगितले, परंतु महाराजांचे सांगण्याप्रमाणे पुन्हाहि मुक्काम करण्याचे या दुष्ट कामगारांनी कबूल केले नाही. तेव्हा त्या चालते मजलीच्या कूच्याच्या दिवसात शेवटी मुकामाचे वेळी जेव्हा पालखी उघडून पाहिली तो मृत्यू जाहाला होता, त्यास मेजर जनरल लाइउड़क म्हणत होते की बहादूर सिपाई नामदार जीवाचा पुरुष कीर्तिमान नामंकित चतुर सर्वमान्य गुणवान योग्य पुरुष होता. जेव्हां पालखी उघडून पाहिली तेव्हा त्यात प्रेत लांब, निर्जीव होऊन पडले होते. ते बाहेर काढले, त्या समई हा मोठा प्रलय होऊन सर्वाचा हाहाःकार जाहला होता. हा खून केला किंवा नाही? तुम्ही सर्वत्र सांगा बरे? (होय होय, कसाबाचे काम, शेम, इत्यादि.)
ता. ५ जुलै इ.स. १८४७ रोजी ह्यूम इस्कायर मेंबर यानी पार्लमेंटात सेनापतीचे मरणाविषयीचा मजकूर दरबारात बोलले. ते पार्लमेंटरी बुक पान ५० पहा. त्या बोलण्यासमई सर जेम्स दुसरे हेगे डिरेक्टर्स यानी उत्तर केले की तुम्ही हा मजकूर सांगता, परंतु सदरहू बोलण्याप्रमाणे ऑफिसर कबूल करीत नाहीत. त्याजवरून हा मजकूर सत्य नाही, त्यानंतर ता. १६ जुलै रोजी पुन्हा ह्यूम इस्कायर याणी पुरावा दस्तैवजी पालमेंटचे दरबारात दाखवून भर कचेरीत बोलून हेग डिरेक्टर्स यास पार्लमेंटाचे दरबारात खोटे केले. (सदरहू छापील बुकाचे पान १४७.) हे पत्र कोर्ट डिरेक्टर्स याणी मुंबई गव्हर्नमेंटास ता. २ सप्टेंबर सन १८४० नं. १६ लिहिले (डिरेक्टरी बुक छापील पान ३८८). सदरहू पत्राचा तरजुमा पुढील प्रमाणे-
सातारचे महाराजाचे स्वारीबरोबर बनारस येथे बाळासाहेब सेनापती रस्त्यातून जात असतां त्यांची प्रकृति बिघडून जेव्हा आम्ही बाळासाहेब सेनापती यांच्या मृत्यूची खबर ऐकली तेव्हां आम्हास मोठा संताप आला. ले. क्रिष्टल सातारचे काढलेले राजास कैद करून नेण्याचे कामावर होता. त्याचे वर्तणुकीविषयीचा मजकूर आम्हांस कळून भारी कोपायमान गोष्ट वाटली. तो मजकूर आम्हीं खालीं लिहिला आहे. त्याजवरून तुम्हांस कळेल. तो म्हणजे सेनापतीचे जीवास बरें वाटत नव्हतें असें दिसतें. परंतु येविषयीं खबर काल दोन प्रहरांपावेतो आम्हांस समजली नाही. नंतर काही घटकेंत आमचे मागील शेवटचे मुकामाहून कूच होऊन जाण्याचे पुढे कितेक राजाचें लोक आम्हांकडे येऊन मुकाम करण्याविषयी बोलले. आणि सांगितलें कीं, सेनापतीचा अति अवस्थ फार कठीण वाखा आहे.
त्याचा मजकूर असा आहे की त्यास रस्त्यांतून चालतांना म्याना हलण्याची इजा सोसणार नाही. याप्रमाणे ते लोक बोलले. परंतु त्यांचे बोलणे आम्हीं कबूल केले नाही. आणि आमचे मनांत असे वाटले कीं, हे वाटेनी जाण्यास विलंब करण्याकरिता हा नुसता बहाणा दाखवीत आहेत. आणि मला ठाऊक होते की, आमचे कूच करण्याचे सिरस्तेप्रमाणे तंबू व डेरे राहुट्या वगैरे जसे दररोज नेहमी पुढे रवाना करितों त्याप्रमाणे सरंजाम रवाना केला होता.
परंतु जेथें आम्ही जात होतो ते त्या लोकांस वाईट वाटले. नंतर तिसरे प्रहरी म्हणजे तीन वाजतां सायंकाली कारकून वगैरे राजांचे लोक येऊन सेनापतीचे मरणाची खबर आम्हास सांगू लागले तेव्हा समजले. सेनापतीकडील मजकूर ले क्रिष्टल यास कळला असतो त्यास असत्य वाढून कुछ करून त्यास चालविण्याविषयी सांगितले. त्याजवरून आमचे नजरेत असे आले आहे की क्रिष्टल यास त्यांचे लोकांचे सांगणे खोटे वाटले ही सबद बिनआधार आहे. परंतु सदरहूविषयीं क्रिष्टल याने असे काम करण्यास त्यास अधिकार नव्हता. यद्यपि बरोबर डाक्टर म्हणजे वैय नव्हता तरी मुकाम करण्याचे करावयाचे होते. त्या आजान्याची भेट जातीने जाऊन घेऊन त्यानी त्यास नजरेनी पहावयाचे होते, त्यानंतर आपले बुद्धीप्रमाणे करावयाचे होते. सदरहू मजकुरावरून हा विचार आम्ही तुम्हास कळवितो कीं, तुम्हीं या मजकुराची ले. क्रिष्टल यास सूचना करावी म्हणून आमची मर्जी आहे.
तुमचे प्रीतीचे स्नेही
सही बेली चेअरमन
लायल, डे. चेअरमन. वगैरे
लंडनहून रवाना
२ सप्टेंबर सन १८४०.
पहा याच क्रिष्टल यास मुंबई गव्हर्नमेंट यानी ता. २१ नवंबर इ. सन १८३९ रोजी सालिना ५०० रुपये दरमहा जास्ती देण्याचे कबूल करून सेनापतीस इजा देऊन मारिले. यापेक्षा जास्ती मुद्दा आता काय दाखवूं?
आतां तुम्हां सर्वांपुढे विनंती करतों. परंतु माझे संगती सोबती हो क्षमा करा. फ्रेंच लोकांची चाल जे अलजीर्स अगर टाहिटी म्हणून मुलूख आहेत त्या मजकुराच्या कथा येथे मी सांगत नाही. आणि निष्टूरता व जुलूम मोरोको म्हणून मुलूख आहे त्या पातशहाच्या गोष्टीहि मी सांगत नाही, न्यू झीलंड म्हणजे त्या मुलुखाची वनमाणसे अघोरी जे निष्टूर दुष्ट कर्मे क्रूर करितात त्याहि कथा वार्ता गोष्टी मी येथे सांगत नाही. नुसते एक मात्र सांगतों की जे ब्रिटिश इंडिया म्हणजे हिदुस्थान, जे काही इंग्रेजी लोकांच्या अमलाखाली आहे, त्यांत दुष्ट लोकांनी जे प्रसूतकाली बायकांबद्दल मुक्काम करून राहण्यास फुरसद न देणें व साधे नामदार पुरुषांचे अंतःकाली जे वर्तेल त्याजकडेहि सदरहूप्रमाणे काम केले आहे.
पहा ते लोक अशा कृत्यास लाचार होऊन त्यास कोठे काही उपाय नाही त्यांस अशी दुःख देता? जे दोस्ती करून गव्हर्नमेंटावर भरवंसा ठेऊन राहातात त्यांचा नाश अशा प्रकारे करून दगेबाजीने सर्व हरण करिता? आणि जे दुष्मानी करून या गव्हर्नमेंटास धिःकार करून मारण्यास उभे राहातात त्यांच्या पाया पडून हे गव्हर्नमेंट पळून येतात! पहा, काबूलची साक्ष. पहा बरें, अशी जी दुःखदायक कामे केली ती इंग्लीश गव्हर्नमेंटाचे नांवाने जे अंमल करितात ते कुल हुकुमतीनिशी मोठे अधिकारी होऊन दगलबाजीची कामे करितात.
त्या चाली, रीती, स्थिती सारी भी सांगून दाखविली आहे. त्यास तुमचे अशा लोकांच्या हाताखाली ते निर्मल लोक दु:ख वेदना नानाप्रकारच्या अशा प्रकारच्या भोगतात. परंतु जी अशी ज्यानी कर इजा दिली. जनविरुद्ध कामे केली, त्यापैकी मजकूर मी थोडासा सांगितला. परंतु पहा जी जी दुःखे देवून उपद्रव केले त्याचा शंभरावा हिस्साहि मी तुम्हांस सांगितला नाही. जी काही भाषणे मला बोलतां सांगता येतात ते नक्षे व चित्र महान आहेत. तेव्हा कोणती कोणती आणि किती किती म्हणून दुःखे दिली व जी जी खोटी सरकटें गव्हर्नमेंटानी केली ती सारी तुम्हां पुढती व्यवस्था किती प्रकारची म्हणून सांगू? जे काही हे लोक म्हणजे इंग्लीश लोकांचे ठायीं गैरजागले (?) असून त्याच लोकास तुमचेच इंग्लीश जातीचे म्हणतात.
त्याणी समजून मजून माझे छत्रपती पातशहा हे कैदी व त्यांचे वंश कुटुंब व विश्वासुक स्नेही व नौकर व पदाधिकारी त्यांचे देशत्यागाचे सोबती याजवर अखेर पहा. कामदार अगर मामलेदार व कारकून व रयत वगैरे जे जे राजाचे तर्फेस त्या त्या मनुष्यमात्रास त्रास दुःखे व देशभ्रष्टवृत्ति उच्छेद व कित्येक बडतर्फ केले. हे तुमचे नावानी व हुकमतीने व तूर्त सदीच्या जोरानी असे प्रकारचे उपद्रव केले. हे तुम्ही कबूल करिता? (नाही नाही.) परंतु त्यामध्ये सदरहू जे काही गुणलक्षणवान सुजन बहुमान्यतेचे सूज्ञ तेच सत्यपणानी असेहि केले असता मान्य करितात, हे तुम्ही सूडा लोक चरित्र ऐकून खरें तेच नजरेंत आणून मान्य करावयास आनंद होतो. त्यास अशा संकटात घालून जसे दुष्ट जनास काही अन्यायावरून आपराधी असतात आणि त्याचे पारिपत्य केले ते दुःख भी किती तुम्हास समजावू? परंतु समजावितो की, अशा रीतीचे दुष्ट खराब काम तुम्हा इंग्रज लोकांच्या नांवावरून हे पारिपत्य गैरन्याय करून जाहाले.
ते मी पुन्हां तुम्हांस सांगतो की, तुमची कीर्ति व अब्रू व प्रतिष्टा व फायदा वाढविण्याबद्दल हे काम केले आहे. हे तुम्हांस माहित आहे किंवा नाही ते न कळे, सबब मी तुम्हाकडे सदरहूं मजकूर समजावण्याबद्दल आलों आहे. तुम्हांस विचारितों की जेंजें ऐकलें व जेंजें पाहिले अशा रीतीच्या वस्तू ह्या योग्य अथवा अयोग्य, अशा या व्हाव्या किंवा न व्हाव्या? पहा. बजिनस असें जाहाले आहे. त्यास तुम्हास कळून असे होऊ द्याल? आता तुम्हांस कळले हे रद्द कराल किंवा असेच राहू द्याल? आणखी ऐका हो. तुम्ही इंग्लंडचे बायका पुरुष सारी दुष्ट कर्मों बजिनस असतां त्या लोकांचा खरेपणा तुम्ही दिलांत आणून पसंत करिता किंवा खोटे काम रद्द करून खरे तेच पसंत करितां? (होय होय होय, इनसाफ देऊ.)
तुम्ही माझेवर शत्रू होऊन उभे राहून त्या तरकटी लोकांस मदत देऊन भी फक्त फक्त इनसाफ मिळविण्याविषयींच्या तजविजी व उपाय करण्याबद्दल तुम्हांपाशी मागतो. प्रार्थना करतो. त्यांस तुम्ही नाहीं किंवा होय म्हणता हें दोन्हींतून एक खास मला सांगा? (खऱ्याची मदत करूं.) जे तरकटी खराब दुष्ट ज्यानीं अशीं कामें केली त्यांची पारिपत्यें केली नाहीत आणि अशा खराब लोकांस दौलत व रुपये व लांच द्रव्य देऊन त्यास द्रव्यवान मुंबई गव्हर्नमेंटानीं उत्कृष्ट इनामे बक्षीस वोंझली लोटून दिल्या.
मी फ्लाटफॉर्माच्या तिकिटी म्हणजे या कचेरीत बोलण्याची जागा उंच वेगळी व बोलणे ऐकण्याची जागा वेगळी त्यास या सभेत डिरेक्टर्स हाली चोवीस व माजी च्यार येत, तौस व सेक्रेटरी यास येणेप्रमाणे येण्याबद्दल बोलावणे शिरस्ते प्रमाणे केले. त्यास येथे कोणी डिरेक्टर्स आले आहेत? (बहुतेक हसून बोलले-खराब लोकांचे मदतगार कशास येतील?) कोणी आले? (नाही.) आता मी माझी जी सेवाचाकरी अल्प मतीने तुम्हा सर्वांपुढे बजावली ती जसे मनुष्यास करणे योग्य आहे त्याप्रमाणे मी केले. त्या लोकांच्या वर्तुणुकीचीहि खरी अवस्था सदरहू सारी समजाविल्याप्रमाणे आहे.
ती कथा अव्वल अखेर तुम्हांस समजाविली आणि माझा अखेरपणा आणि कामाचा अधिकारपरत्वे जे तुमच्या स्वतःचे पार्लमेंट म्हणजे राज्यदरबाराचे कचेरीची सभामंडळीनीं व तुमचे स्वदेशी लोकांचे अधिकारपरत्वे त्यानी या मोकदम्याची ही अवस्था पाहून या कामांत सत्यपणानी चौकशी करण्याविषयी इच्छा करून हे आता तुम्हांपाशी मी मागतो.
कारण जे जे तुम्हांस मी सांगितले त्याप्रमाणे जर मी खरा निघोन तुम्हांपुढे येईन ते खरे; आणि ईश्वर खरे तेच करील आणि येविषयी माझे सत्यवचन आहे की, हे मी ईश्वरापुढे सांगतों. नजर ठेवून पुरे चित्तांत आणा. हे सांगणे हिंदू व क्रिष्टियेन म्हणजे यांच्या ईश्वरापुढे हा मजकूर सांगतो. मी तुमचे उदारत्वे कीर्तिवरून व तुमची दया व कृपेकरून व तुमची साफ व निर्मळ अंतःकरणे पाहून व तुमचे शुद्ध व्यवहाराचे प्रत्ययावरून जे तुम्ही इंग्लिश असून शुद्ध चालचलन व रीतस्थित बाळगून संभाळून चालता व दुःखीत मनुष्याविषयीं अंतःकरणापासून हळहळ कळकळ कोमल मनानी करिता, त्याजवरून मी आपले तनमन तुम्हास अर्पण करून मागतो की जे काही माझे स्वामी प्रतापसिंह महाराज छत्रपतीनी आपले स्वमुखानी त्याजपाशी इनसाफ मागितला तो असा की त्या फिर्यादीस न्यायाधीशाचे हातापासून इनसाफ मागितला.
त्याप्रमाणेच मी तुम्हा सर्वत्रांपाशी विनंती करून मागतो की माझे स्वामी महाराज छत्रपतीचे मोकदम्याचा न्याय करून द्यावा. स्वताचे महाराज छत्रपतीचे शरीराचा बचाव व्हावा. हे ऐकण्यास आले त्यानी या समयी विलंब न होऊं देतां हे त्वरीत घडविणे. जेणेकरून माझे छत्रपती स्वामीचे सत्य व कीर्ति सर्व जनांत प्रकट होईल ते करावे आणि जे अपराध या शत्रूनी गुप्त रीतीने तरकटे करून महाराजांचे अंगास जबरीने लावले, ते फितूर महाराज छत्रपतीचे मनी ध्यानी स्वप्नी अथवा कल्पनेत केव्हाहि मनांत आले नाहीत व काही माहितहि नाही. यापेक्षां महाराज छत्रपति अधिक मागत नाहीत. पहा. सर रॉबर्ट माजी गव्हर्नर मुंबई याची मिनिट म्हणजे संमत पत्रे, पैकी हंशील मजकूर-
"ता. २० सप्टेंबर सन १८३७ (पार्ल. पा. १०० कलम १३) पैकी, पुन्हां मला असे वाटते की कर्नल ओव्हन्स यास सूचना करावी. आणि महाराजावर जे मुकरार केले आहेत तो मोकदमा संपूर्ण तपशीलवार त्याणी तयार करावा. आणि जेव्हा त्याची चौकशी समाप्त होईल तेव्हा तपशीलवार मोकदमा महाराजास प्रविष्ठ करावा. म्हणजे त्याणी हरकाहीएक मजकूर समजाविणे किंवा महाराजांचे इच्छेस येईल त्याप्रमाणे उत्तरे देणे ती देतील."
"ता. १५ आगष्ट सन १८३७ (पा. पा. ८५ कलम १२) पैकी पुन्हा मला चित्तांत मोठी गोष्ट खचित वाटते की या मोकदम्याची समाप्ती करण्यापूर्वी महाराजावर ज्या साक्षी घेतल्या त्या महाराजास समजवाव्या. म्हणजे महाराज आपले बचावासाठी अथवा ये विषय त्याणी उलट मजकूर समजाविणे बद्दल त्यास काही वेळ समय फुरसद द्यावी."
असे असतां नकला दिल्या नाहीत. पुन्हा पहा-
"ता. ३१ मे सन १८३८ (पार्ल. पा. २०५ कलम ५३) पैकीं तत्रापि. शिरस्तेप्रमाणे हे पुशिले जाईल. म्हणजे केव्हाहि जन विचारील आणि महाराजास अन्यायदार जर ठरविणे असल्यास महाराजास आपले बचावासाठी वेळ फुरसद द्यावी की नाही. त्यांस ज्या साक्षी ओव्हन्स यानी घेतल्या त्याची खबर व जबान्या राजास दिल्या नाहीत."
आणखी सांगतो की महाराजास खास मुकरार अधिकार आहे की राजानी हुकमतीचे. सत्तेनी सदरहू पाहणे, ऐकणे, विचारणे हे बरहक आहे. तत्रापि या विचाराशिवाय आमचे चित्तात दुसरे काही नव्हते. किंबहुना इतकेहि अझून आम्हास वाटते की, यद्यपि त्यास खरेपणा अगर यशप्राप्ती होईल किंवा नाही येविषयी आम्हास अंदेशा चित्तात वाटत आहे. जोपावेतो महाराज जिवंत आहेत तोपावेतो सदरहू मागण्यात कमीहि न करिता प्रथम मागितल्याप्रमाणे करून घेतले शिवाय त्याची खातरजमाहि होणार नाही. याजकरिता प्रार्थना सर्वांची करितों की पार्लमेटात तुमचे वकील मेंबर लोक आहेत. ते तुमचे जाग्याचे मसलतदार. तुम्ही सर्वत्रानी प्रमुख करून ते राज्यसभेमधी बसतात. त्याजवर तुमची हुकमत अशी आहे की, न्यास त्या न्यायाधीषीत राजकीय सभेच्या पदावर नावास मोठे वाढवून तुम्ही पार्लमेंटचे मेंबर करून त्याठिकाणी त्यास चढविले. त्यानी तुमचे आज्ञेप्रमाणे चालून न्याय बजावून दाखवावा असा शिरस्ता आहे.
त्याजवरून माझी विनंति तुम्हा सर्वत्रापाशी आहे की माझे छत्रपती सरकारचा मोकदमा त्या राजसभा म्हणजे पालमेंटचे दृष्टीपुढे नेण्याविषयीची तजवीज करून त्या सभेमध्ये मेंबर लोकांचा आश्रय मला मिळून सदरहू मोकदम्याची जी अवस्था जाहाली त्याचा तपास पुन्हा चौकशी व्हावी. पहा, हरकोणी मनुष्याचा हक्क न्यायनीतीने इंग्रजांच्या अंमलाखाली जे आहेत त्या त्यास इनसाफ मागण्याचा अधिकार आहे. आणि त्याणी पाहणे ऐकणे चौकशी करण्यास निरंतर अधिकार आहे. सबब महाराज छत्रपतीच्या फिर्यादीत पार्लमेंटात या लुटारू व कुभांडे त्या लोकांनी करून महाराज छत्रपतीस मोठे क्लेश, हत्तीस जसे अंकुशाचे होतात त्याप्रमाणे जाले, ते परमेश्वराचे स्वइच्छेचे सत्वे करून न्यायधर्मास चौकशी करण्याबद्दल माझे छत्रपतीसरकार कबूल करून या दुष्ट तरकटी. खोटे लोकांस सोडून देतात. त्यांस ईश्वरच पाहून घेईल.
(परिशिष्ट १४) आप्पासाहेब भोसल्याने दत्तक कसा घेतला त्याची मनोरंजक माहिती
श्रीमंत औंधाधिपति भवानराव श्रीनिवास ऊर्फ बाळासाहेब पंत प्रतिनिधि यांच्या आत्मचरित्रात सातारचे आप्पासाहेब भोसले यानी मरणाच्या अखेर घटकेला दत्तक कसा घेतला, याची मनोरंजक माहिती दिलेली आहे.
आप्पासाहेब महाराज जेव्हा आजारी होते, तेव्हा श्रीमंत बाळासाहेबांचे आजोबा परशरामपंत ऊर्फ ‘अवलिया’ थोटेपंतहि आजारी होते. ते सातान्यास पंतांच्या गोटात रहात होते. थोटेपंत दत्तक घेण्याच्या विरुद्ध होते, पण अखेरीस अनेकांच्या आग्रहासाठी त्यानी दत्तक घेतला. आप्पासाहेब भोसले यांनाहि दत्तक घेण्याविषयी रेसिडण्ट फ्रियरने पुष्कळ आग्रह केला. पण त्यांचे मन बाळासाहेब भोसले राजाज्ञा नावाच्या एका भलत्याच कुळातल्या पोरावर असल्यामुळे, रेसिडण्टने संमति दिली नाही. ‘तुमच्याच कुळातला कोणीतरी चांगला पोरगा दत्तक घ्या. मी परवानगी आणवतो.` असे त्याने परोपरीने विनवले, पण आप्पासाहेबांचा हेका जाई ना. अखेर आयुष्याचा शेवट झाला!
आप्पासाहेब महाराजास वैद्यकीय ज्ञान फार चांगले होते. नाडी परीक्षा त्यास उत्तम होती. पण नुसत्या चेहऱ्यावरूनहि ते प्रकृतीचे मान ओळखीत.
शेवटचे आजारात त्यानी आपल्या पलंगाचे दोन्ही बाजूस मोठाले आरसे ठेविले होते आणि त्यात प्रकृतीचे मान वरचेवर चेहरा पाहून ठरवीत असत. एक दिवस त्यानी मंडळीस स्पष्ट सांगितले की ‘आता काही ठीक चिन्ह नाही. आम्ही एक दोन दिवसांचे सोबती आहो.’
मग दत्तविधान करावे म्हणून मंडळी घाई करू लागली. रेसिडेण्टास महाराज दत्तक घेणार आहेत. म्हणून सांगितल्याबरोबर तो महाबळेश्वरी निघून गेला. सर्व काम घाईघाईने उरकण्याची मंडळींची गर्दी झाली. पण अप्पासाहेब महाराजांची प्रकृति फारच बिघडली होती.
इकडे आमचे आजोबाहि आजारीच होते. म्हणून ते राजवाड्यात जातच नसत. किंबहुना गोटांतील बंगल्याचे बाहेरहि येत नसत. सकाळी दहा वाजण्याचे सुमारास ते एकदम पलंगावर उठून बसले व म्हणाले, ‘गोविंदा, मला स्नानास पाणी आण. आमचा मालक गेला.`
जवळ मंडळी होती ती म्हणाली, ‘‘महाराज, असे कसे म्हणता? दत्तविधानाची गडबड चालली आहे. वाद्ये वाजताहेत. बार सुटत आहेत.’’
आजोबा म्हणाले, ‘‘आता मढ्याचे मांडीवर दत्तक देऊन काय उपयोग आहे? राज्य बुडाले. आता काहीएक व्हावयाचे नाही.’’
आजोबांनी म्हटल्याप्रमाणे स्नान केले. इतक्यात दत्तविधानाची साखर घेऊन कारकून आला. आणि त्याचे मागोमाग अप्पासाहेब महाराज गेले म्हणून बातमी आली.
(आत्मचरित्र पान ५५-५६)
परिशिष्ट १५) बाळाजी नारायण नातू
मऱ्हाठशाहीच्या उत्तरार्धांत बाळाजीपंत नातू ही एक कमाल बुद्धिमतेची व्यक्ती होऊन गेली, यात तिळमात्र संशय नाही. कै. सरदार गोपाळराव हरि देशमुख (सुप्रसिद्ध लोकहितवादी) यांनी आपल्या ‘ऐतिहासिक गोष्टी’ पुस्तकात (भाग १, पान १५१) दुष्ट मंडळींची नावे दिली आहेत. त्यात पठाण गुलाम कादर (दिल्लीवाला), सर्जेराव सखाराम घाटगे, सिदोजी आपा देसाई निपाणकर, हरिपंत भावे आणि परशुरामपंत प्रतिनिधि यांची नावे आहेत. पण बाळाजीपंत नातूची अचाट बुद्धीची दुष्ट कर्मे या सगळ्यांच्या दुष्टपणावर ताण करणारी असूनहि या यादीत त्याचा समावेश झालेला नाही. कदाचित असे असेल. घाटगे कादर भाव्यादि मंडळी जात्या स्वभावानेच दुष्ट, बुद्धिहीन नि राक्षसी प्रवृत्तीची बाळाजीपंताच्या कमाल स्वार्थी स्वभावाने मऱ्हाठशाहीचा आधीच लंजूर झालेला डोलारा लवकर कोसळला, तरी त्याच्या अचाट बुद्धिमत्तेविषयी आणि राजकारणी डावपेच लढविण्याच्या शिताफीविषयी क्षणमर कौतुक वाटल्याशिवाय रहात नाही. आंग्रेजांसकट मोठमोठ्या मऱ्हाठी मुत्सद्याना बोलबोलता चकवून ठकविण्यात नातूचा बुद्धिप्रभाव आणि ठकविलेल्या लोकांकडूनहि वहावा मिळविण्याची त्याची शहामत अनन्यसामान्यच म्हटली पाहिजे. त्याने शेकडो वेळा पगड्या फिरवून हजारो स्वराज्यद्रोही कुलंगडी केली. पण स्वता अगदी नामानिराळा राहून दोनहि पक्षांकडून त्याने जहागिरी वतने मानपान उपटण्यास कमी केले नाही. धूर्त आंग्रेज नातूला पुरे ओळखून असत, पण त्याच्या सल्लामसलतीशिवाय त्यांच्याहि राजकारणाचे घोडे पदोपदी ठेचाळत असे. ही काय सामान्य बुद्धिमत्ता म्हणावी? स्वदेश, स्वराज्य नि स्वधर्म यासाठी त्या बुद्धिमत्तेचा सदुपयोग झाला नाही, म्हणूनच बाळाजीपंत नातू म्हणजे एक हरामखोर हा बदलौकीक अजरामर झाला एवढेच. पाचवडच्या एका भिक्षुक भटाचे पोर ते काय, आणि राज्यक्रांतीच्या काळात स्वदेशी मुत्सद्यांच्या नाकांत वेसणी घालून त्यांना आपल्या धोरणावर नाचवते काय! आश्चर्य नव्हे का?
कै. लोकहितवादी नातूची पूर्वपीठिका अशा देतात-
‘‘बाळाजी नारायण नातू हे कोकणातून रोजगाराकरिता आले. ते भिवाजी नाईक हुजरे यांजकडे खासगी कारकून होते. नंतर ते हसबनिसांकडे होते. त्यानंतर ते खडेराव रास्त्यांचे पदरी राहिले. परंतु ते बहुत धूर्त व काम करणारे चांगले म्हणून पुण्यास श्रीमंत वसईहून आले तेव्हां एलफिन्स्टन साहेबानी बातमीदार म्हणून त्यांस दोनशे रुपये महिना देऊन ठेविले. श्रीमतंहि त्यास आपलेकडे बोलावीत, परंतु ते त्यानी कबूल केले नाही. पुढे श्रीमंतांचे राज्य गेले तेव्हां त्यास बारा हजारांची जहागीर इनाम दिली. ते एलफिन्स्टन साहेब यांजवळ दिवाण म्हणून वागत असत. याजमुळे त्यास पैसाहि पुष्कळ मिळाला व पटवर्धन, आंग्रे, कोल्हापूरकर राजे यांजकडूनहि गाव इनाम मिळाले व त्याजवर एलफिन्स्टन साहेबानीहि सह्या करून दिल्या. सातारचे बुवासाहेब महाराज काशीस नेले तेव्हा त्या चौकशीवर सरकारने नातूस पाठविले होते. त्या वेळेस आप्पासाहेब गादीवर आले व त्यानी नातूस बारा हजाराचे गांव दिले. तरी इंग्रेजांचे मंजूरीशिवाय त्यानी कधि काही घेतले नाही. शिवाय, प्रतिनिधि, सचीव वगैरे यास दत्तक दिले तेव्हाहि बहुत पैसा मिळाला. त्याजवळ पाऊण कोटीची रोख जिनगी होती व पन्नास हजाराचे इनाम होते, त्याशिवाय हजार रुपये महिना पेनशन होतेच."
पेशवा दप्तर भाग ४१ येथे पहिलेच एक पत्र (सन १७९२) छापले आहे. त्यात महादेवशास्त्री यानी बाळाजी पंत नातूला पेशव्याच्या दरबारात नोकरी देण्याविषयी हरिपंत तात्या फडक्याला शिफारस केली आहे :
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री हरिपंत तात्या यासी.
प्रति माहादेव शास्त्री आशीर्वाद उपरी येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लेखन करीत जाणे विशेष.
राजश्री बाळाजीपंत नातू याजला आपण हरकोठे अन्नास लाविले पाहिजे म्हणून पूर्वी आपणाजवळ आम्ही बोललो होतो. त्याजवरी आपण मान्य केले, त्यास मशारनिले दप्तरी उमेदवारीने सरकारचे लिहिणे लिहितात. दोन वर्षे जाहाली. लिहिणार चांगले जाहाले. रामचंद्रपंत ढमढेरे यास आम्हीहि विचारिले. त्याणी प्रत्योतर दिल्हे की आमचे निशेचे आहेत. श्रम बहुत याणी केला. कर्जदार लोकांचे बहुत जाहले आहेत. याची सोय आपण करून दिल्ही पाहिजे, तालुके रायगड हा किला सरकारांत नवा घेतला तेथे असामी कारकुनाच्या होतील. यास्तव आपणास याचे चालवणे. आपले जावई व आमचे नाचे हे आपले स्वकीये आहेत. यांस तेथे एक असामी आपण करून दिल्ही पाहिजे. यास सर्व भरवसा आपला आहे. आम्ही तेथे यावे तर आमचे शरीरी समाधान बहुत नाही. यास्तव आम्ही आलो नाही. तेथे कारकुनाची नेमणूक बेहड्यास होऊ लागली तर एके असामीस नाव याचे लावावे. परस्परें ऐकिलें की फडणिसी व मजमदारी दुसरे कोणी गृहस्तानी करून घेतली. बाकी असाम्या होणार. त्या आपणास कळतील. ब्राम्हणास अन्नास लाविले पाहिजे. यांस पाठवून द्यावे ऐसा प्रकार असिला तर पा देऊ. आम्ही आपणाजवळ शब्द घातला आहे हा आपण सिधीस नेला पाहिजे. बहुत काय लिहिणे हे आसीर्वाद.
नातूच्या दीर्घधोरणीपणाची लोकहितवादी एक आख्याइका देतात -
"पुण्यास बाजीरावाचे व इंग्रजांचे युद्ध होण्याचा निश्चय झाला आणि ज्या दिवशी फौज बाहेर निघणार, त्या दिवशी सकाळी आठ वाजता बाळाजीपंत नातू मेण्यांत बसून एलफिन्स्टन साहेबाकडे खबर देण्यास गेले. लढाईचे दिवशी जाताना वाटेत त्यांचा एक मित्र त्यांचे मेण्याशी जावून म्हणाला की `दादा, तुम्ही इंग्रजांकडे जाता, पण पुन्हा पुण्यात येण्याचा विचार काय केला आहे?’ त्यास दादा म्हणाले की ‘मी इकडील व तिकडील सर्व विषय ध्यानांत आणून निश्चय केला आहे की. इंग्रजांकडे जावे हेच योग्य. बाजीराव यांनी काही तयारी केली नाही आणि लढाईचा मनसुबा केला आहे. ह्यांचे राज्यातच हजारो शत्रू आहेत व ह्यास कोणी साह्य नाही. याजकरिता त्यास जय यावयाचा नाही. इंग्रजांची सर्व तयारी आहे व ते शहाणे आहेत. याजकरिता थोडेच दिवसांत श्रीमंत जातील आणि आम्ही खुशालपणे पुण्यांत येवू, हा माझा पूर्ण निश्चय आहे व असें जाणूनच मी इंग्रजांकडे जात आहे.’
पुढे त्याचप्रमाणे सर्व गोष्टी घडल्या. (ऐतिहासिक गोष्टी, भाग १, पान ६४)
बाजीरावाच्या सैन्यातहि नातूने फितुराचा कडेकोट बंदोबस्त केला होता. म्हणूनच त्यास जय यावयाचा नाही असे त्याने आपल्या मित्राला छातीठोक सांगितले. तोफखान्यावरच्या अंमलदाराने बाजीरावाला सांगितले की, इंग्रजांशी एक वर्ष लढाई चालू राहिली तरी भरपूर दारूगोळा शिल्लक आहे आणि याच आश्वासनाच्या हिंमतीवर बापू गोखल्याने चढाईची कंबर कसली त्या बिचाऱ्याला काय कल्पना की सगळा दारूचा साठा कृत्रिम बनवलेला होता ते! (ही रीत अशी. घोड्याची लीद उन्हात वाळवून तिची वस्त्रगाळ पूड करायची. कोळशाचे पाणी देऊन तिला काळा रंग आणावयाचा. बाजरी नाचणी अर्धवट भाजून त्या लिदीत मिसळायची कीं हे मिश्रण चक्क खऱ्या दारूप्रमाणे दिसायचे.) खडकीला लढाईचे तोंड लागतांच पेशव्याच्या शिलेदारांनी बंदुका ठासल्या. पण एकहि गोळी बाहेर उडे ना नि ठासलेली बाहेरहि निघे ना, तोफांचा तोच प्रकार पाहून बापू गोखला गडबडला, अंग्रेजी तोफांपुढे पेशव्यांच्या सैन्याची खडकीला धूळधाण उडाली. नातूच्या कारस्थानाचे गिरमीट किती खोलवर भोक पाडून स्वस्थ बसले होते, याची त्या साध्यासीध्या लढवय्याला काय कल्पना असणार?
बाळाजीपंत नातूबद्दल माहितीचा जो पुरावा रंगो बापूजीने लंडनहून ठिकठिकाणी खासगी पत्रे पाठवून मिळविला होता, त्यात आबाजी हरि शहाणे वाईकर या गृहस्थाचे ता. ११ एप्रिल सन १८४२ चे एक पत्र आहे. खंडेराव रास्त्याच्या शागीर्दीतून नातू कसा वाढला, नागो देवरावचा व त्याचा संबंध काय होता आणि बाजीरावीत त्याच्या काय काय धामधुमी झाल्याचे तुम्हाला माहीत आहे, अशी रंगो बापूजीची पृच्छा होती. त्याला रा. शहाणे उत्तर देतात-
‘‘बाजीरावीच्या वेळी मी लहान होतो. म्हणून वाडवडील बोलतात तेच कळवितो. सन १८१९ मध्ये बाळाजीपंत नातूने आपली मुलगी निळकंठशास्त्री थत्त्याच्या मुलाला दिली. त्या वेळी नातू व नागो देवराव यांचे फार सूत होते. नागो देवराव सन १८३७ त मरेपर्यंत दोघांची मैत्री होती. एक गोष्ट मात्र मला पक्की स्मरते. बाळाजीपंत नातूने एकदा वाईचे बरेच ब्राम्हण जमवून, तो त्याना रहिमतपुरास घेऊन गेला. त्या वेळी मालकम साहेब धारवाडास जाण्यासाठी तेथे छावणी ठोकून होता. नातूच्या पुढारपणाखाली त्या शेकडो ब्राम्हणानी छावणीभोवती जमून मोठा गिल्ला केला व प्रभू जातीच्या विरुद्ध नाही नाही त्या कागाळ्या साहेबाच्या कानावर घातल्या. त्यात नागो देवरावहि होता. कित्येक दिवसपर्यन्त हा ब्राम्हणांचा जमाव मालकम साहेबाच्या छावणीबरोबर हिंडत पाठलाग करीत होता. अखेर साहेबाने कंटाळून त्यांना जबाब दिला की तुमच्या व इतर हिंदूंच्या धार्मिक तंटेबखेड्यात पडण्याची आम्हाला जरूर नाही. गोवे सरकारशी राजद्रोही कट छत्रपतीनी केला अशी, बाळाजीपंत नातूच्या चिथावणीवरून, नागो देवरावने धारवाडच्या सुभ्याकडे जी तक्रार केली होती, त्याचा कोर्टात उलटसुलट शहानिशा व तलास होवून, जज्जाने निकाल दिला की " After making the necessay inquiries into the matter the judge dismissed the case on the ground of the discrepancies and improbable nature of the evidence attempted to be proved against His Highness, which induced that gentleman (the Judge) to look upon the case as an infamous attempt of the Brahmans to criminate the Raja.
(भावार्थ. - राजाविरुद्ध आणलेले पुरावे असंभाव्य, भुसभुशीत नि अविश्वसनीय असे सिद्ध झाल्यामुळे, जज्जाने खटला काढून टाकला आणि एकंदर प्रकरणाचा विचार करून त्याने निर्णय काढला की राजाला निष्कारण पेचात आणण्यासाठी ब्राम्हणानी उभारलेला हा सारा हरामखोर कटच होय.)
गोविंद महादेव साने वाईकर यानेहि बनारसहून ता. २१ एप्रिल १८४२चे एक पत्र लंडनला रंगो बापूजीला पाठविले. त्यातहि वरील सर्व मजकूर असून, विशेष माहिती दिली होती. ती अशी. "पूर्वी बाळाजीपंत नातू आमचे चुलते गणेश नारायण साने यांचे शागीर्द होते व खंडेराव रास्त्याकडे काकांचे निरोप नेणे आणणेचे हारकारूचे काम करीत असत."
(१६) रंगो बापूजी ब्राम्हण नव्हे, चांद्रश्रेणीय कायस्थ प्रभू
लोकमान्य, मुंबई ता. १५-३-४७
सध्या मी रंगो बापूजी आणि प्रतापसिंह छत्रपति यांचे विस्तृत चरित्र लिहीत आहे. नुकताच प्रसिद्ध झालेला क्रांतिवीर तात्याराव सावरकर यांचा ‘१८५७चे स्वातंत्र्य समर` हा ग्रंथ संदर्भासाठी वाचीत असता, खण्ड १, प्रकरण ७, पान ७३ वर एक चमत्कारिक विधान आढळले. रंगो बापूजीला `ब्राम्हण` बनवला आहे. तो उतारा असा:
"तिसऱ्या प्रकरणांत आपण लंडनच्या वस्तीत गुप्त बेत करीत असलेल्या रंगो बापूजीला नि अझीमुल्लाला तेथें तसेंच सोडले होत. सातारच्या या ब्राम्हणाचे नि ब्रम्हावर्ताच्या या खानसाहेबाचे जे काही संभाषण...’’
रंगो बापूजीच्या ‘सातारचा ब्राम्हण’ हा उल्लेख अनैतिहासिक म्हणून चूक आहे. ती नजरचूकहि असू शकेल. पण चूक मात्र खास. स्वतः रंगो बापूजीच्या रंगो बापूजी गुप्ते प्रभु देशपांडे` अशा मोडी स्वाक्षऱ्या हजारों कागदावर आहेत. त्याच्या घराण्याची माहिती मुबलक उपलब्ध आहे आणि त्याचे वंशजहि हयात आहेत. ते चांद्रश्रेणीय कायस्थ प्रभु. ब्राम्हण नव्हते. मग तात्याराव रंगो बापूजीला ब्राम्हण ठरवितात ते कशाचा आधारावर? याचा जाहीर खुलासा होणे अगत्याचे आहे. सातारच्या राज्यक्रांतीचा इतिहास बारीक सारीक तपशीलवार रंगो बापूजीनेच विलायतेला छापून जगजाहीर केलेला आहे.
सावरकरांचा ग्रंथ ऐतिहासिक साधनांत महत्वाचा असल्यामुळे, असली भलती चूक त्यात राहू नये, म्हणूनच हे पत्र लिहीत आहे.
मुंबई २८, ता. १२-३-१९४७
केशव सीताराम ठाकरे
स्वा. सावरकरांचें मत
वरील पत्राविषयी वीर सावरकरांना आम्ही त्यांचे मत विचारले असता त्यानी खालील आशयाचे उत्तर धाडले आहे :
‘‘श्री. ठाकरे यांचे पत्र पाहिले, त्यानी जी लिहिली आहे त्या वस्तुस्थितीवरून रंगो बापूजी हे ब्राम्हण नसून चांद्रसेनीय कायस्थ प्रभू जातीचे होते ही गोष्ट सिद्ध होत आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी ही चूक दाखविली याविषयी मला आनंद वाटतो. माझ्या सन १९०९ मध्ये प्रसिद्धिलेल्या ग्रंथाच्या प्रस्तावनेतच असे लिहिले आहे की, अपुल्या आणि विपक्षीय माहितीच्या आधारावर हा ग्रंथ मला परदेशांत लिहीणे भाग पडले असल्यामुळे ह्या १८५७च्या स्वातंत्र्य समरास अनेक स्वदेशी संशोधकांनी सुधारलेला आणि ऐतिहासिक सत्याच्या दृष्टीने अधिक निर्दोष असलेला असा नवा ग्रंथ प्रसिद्ध होवो की, ज्या योगें माझी ही अल्प कृती लवकरच विस्मृत होऊन जावी."
दैनिक अग्रणी, पुणे, १८-३-४७
टीप : वरील खुलासा जाहीर झाल्यानंतर काही दिवसानी तात्यारावांचे खाजगी चिटणीस श्री. दामले माझ्या बिऱ्हाडी आले असता म्हणाले की `ही चूक ठाण्याचे श्री. रा. म. आठवले यानी मुद्दाम दाखवून हस्तलिखितात तशी सुधारणाहि केली होती, पण पुढे छापखान्यात मजकूर गेल्यावर काय भानगड झाली नकळे!’’
सगळ्याच भानगडी! त्यात या भानगडीचे काय एवढेसे?
ठाकरे
(17) On the 29th December 1835, the following letter was addressed to the Raja of sattara, resolved upon by the Court of Directors of the East India Company.
Your Highness,
We have been highly gratified by the information from time to time, transmitted to us by our Government, on the subject of your Highness`s exemplary fulfillment of the duties of that elevated situation, in which it has pleased Providence to place you.
A course of conduct so suitable to your Highness`s exalted station, and so well calculated to promote the prosperity of your dominions, and the happiness of your people, as that which you have wisely and uniformly pursued, while it reflects the highest honour on your own character, has imparted to our minds the feelings of unqualified satisfaction and pleasure. the liberality, also, which you have displayed in executing, at your own cost, various public works of great utility, and which has so greatly raised your reputation in the eyes of the princes and people of India, gives you an additional claim to our approbation, respect and applause.
Impressed with these sentiments, the Court of Directors of the East India Company have unanimously resolved to transmit to you a sword, which will be presented to you through the Government of Bombay, and which we trust you will receive with satisfaction, as a token of their high esteem and regard.
With sincere wishes for your health and prosperity, we subscribe ourselves in the name of the Court,
Your highness`s most faithful friends, (Signed) W. S. Clark. Chairman,
J. R. Carnac, Deputy.
(१८) मर्द प्रभूवीर सीताराम रंगराव गुप्ते
अंग्रेजांचा कोटा काढण्यासाठी रंगो बापूजीने दक्षिण महाराष्ट्रात केलेल्या उठावाच्या संघटनेचे आधिपत्य आपल्या थोरल्या सीताराम पुत्राकडे दिल्याचे मूळ ग्रंथात सांगितलेच आहे. रंगो बापूजीला अटक होताच, त्याच्याजवळ निरनिराळ्या केन्द्रांच्या सुभेदारांकडून आलेली पत्रे वगैरे महत्त्वाचे कागदपत्र सोजरांनी हस्तगत केले. अर्थात संघटनेचे सारे नकाशेच त्यांच्या हाती पडले. पहिल्या झपाट्याला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सातारच्या राजवंशी मंडळीना अटक करण्यासाठी साताऱ्याला वेढा दिला. त्याच वेळी बेळगांवच्या बाजूलाहि कंपनीचे सैन्य रवाना झाले. साताऱ्यावर हल्ला गेल्याची बातमी समजताच, सीताराम आपल्या निवडक दोस्तांची टोळी घेऊन साताऱ्याच्या बचावासाठी निघाला. इकडे साताऱ्याचा बंदोबस्त करून, कंपनीचे सैन्य त्याच्या तोंडावर मिरजेच्या आसपास चालून आले आणि पाठीमागूनहि बेळगांवकडून त्याचा पाठलाग झाला. सातारकडच्या पलटणींचां नि सीतारामच्या टोळ्यांचा खडाजंगी सामना झाला.
गोळी लागून त्याचा घोडा ठार मरून पडला. त्यालाहि बऱ्याच जखमा झाल्या. सावंतवाडीच्या रामजी शिरसाटाबरोबर दुसऱ्या घोड्यावर बसून, आसपासच्या टोळयाना इशारतीची शिंगे तुताच्या पांगून जमा करण्यासाठी सीताराम मागे परतत असतानाच समोर तोंडावर आलेल्या बेळगांवकडच्या कंपनीच्या पलटणीचा नि त्याचा मुकाबला झाला. त्यांत तो आणि शिरसाट दोघेहि जखमी होऊन पकडले गेले. बेळगांवच्या हद्दीत पकडलेल्या ठाकुरसिंग, मुनशी वगैरे दहा बारा पुढाऱ्यांना आणि या दोघाना हातापायांत बेड्या घालून मोठ्या प्रदर्शनाने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सातारा येथे आणले. कोल्हापूरचा छत्रपति बंधू चिमासाहेब यालाहि पकडला होता, पण त्याला वेगळा काढून निराळ्याच मार्गाने मुंबईला पाठविण्यात आले.
आजूबाजूच्या गावांत दौड्या पिटवून, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सीताराम आणि त्याचे दोस्त यांचे साताऱ्यात एक जाहीर प्रदर्शनच भरवले. ता. ८ सप्टेंबर सन १८५७ रोजी मंगळवारी सूर्योदयाला सातारच्या गेण्ड्याच्या माळावर १८ फासांच्या स्तंभावर हजारो तमासगिरांच्या समोर, सीतारामच्या सतरा साथीदाराना एकामागून एक फासावर दिल्यानंतर अखेर सीतारामला फाशी दिले. आंग्रेजी सत्तेचा वचक आणि दरारा लोकांच्या मनांवर दणदणीत बसविण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हा फाशीचा समारंभ पहाण्यासाठी हजारो आबालवृद्ध स्त्री पुरुषाना खेडयापाडयांतून शेपाटून साताऱ्याला आणले होते. रंगो बापूजी त्यांच्या हाती कधिकाळी सापडला असता, तर त्याच्या फाशीचा समारंभ त्या गोऱ्या खुनसटानी कसल्या दणक्या खणक्यात साजरा केला असता, याची कल्पनाच केलेली बरी.
सीताराम गुप्ते फाशी दिल्यावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या बायको मुलांवरहि हत्यार धरले. पण सीतारामची बायको जानकीबाई. नवऱ्याइतकीच धाडशी, धोरणी नि प्रसंगावधानी होती. रघुनाथ, गोविंद आणि काशीनाथ ही आपली तीन मुले घेऊन, ती डोंगरकपाटी शेतकऱ्यांच्या वसतीत त्यांच्यासारखाच दरिद्री वेष घेवून लपून राहिली. पुढे विकटोरिया राणीचा माफीचा जाहिरनामा प्रसिद्ध झाल्यावर तिच्या दिरांनी तिला हुडकून काढली आणि घरी कारीला परत आणली. तिने कुंकू पुसले नव्हते. रंगो बापूजीचा ठावठिकाणा नव्हता, तेव्हा त्याची पत्नि काकई ही सौभाग्यचिन्हांकित राहिली, यात नवल नाही. पण तिची सून जानकी म्हणे "आमचे पुरुष काय बिछान्यात लोळून घोळून गेले? काय त्यांनी दरोडे घालून लूटमार केली. का कोणा बायाबापड्यांचे तळतळाट घेतले? देशासाठी ते फासावर चढले. ते अमर झाले. मग मी काय म्हणून कुंकू पुसू? नाही पुसणार."
आमरण ती तशीच राहिली. (कै. वामनराव गुप्त्यानी सांगितलेल्या हकिकतीवरून.)
महाराष्ट्रातून अंग्रेजाना निपटून काढून, स्वदेश स्वतंत्र करण्यासाठी जन्मठेप तुरुंगात मुत्युमुखी पडलेल्या किंवा फासावर गेलेल्या अनेक मऱ्हाठी वीरांची महाराष्ट्राला आज आठवणहि उरलेली नाही. मग सीताराम रंगराव गुप्त्याचे स्मरण कोण कशाला करणार? त्या मर्द प्रभुवीराला आज जाहीर पहिला मऱ्हाठशाही मुजरा करण्याचे भाग्य मला लाभत आहे. मी स्वतःला धन्य समजतो!
(१९) कै. नरसोपंत केळकर यांनी ता. ६ मार्च १९२३च्या केसरींत केलेले मेजर बसूंच्या `स्टोरी ऑफ सातारा`चे परीक्षण
मेजर बी. डी. बसू यांनी ’स्टोरी ऑफ सातारा` या नांवाचा नवीन ग्रंथ महाराष्ट्रीय जनतेस अर्पण केल्याने महाराष्ट्राविषयीं त्यांचे साभिमान प्रेम व्यक्त होत आहे. एवढेच नसून त्यामुळे खऱ्या इतिहासांत भर पडली आहे. त्यांची झणझणीत टीका ब्रिटिश राजनीतीचे देव्हारे माजविणाऱ्या आंग्ल लेखकांस झोंबणें साहजिक आहे. मुंबईचे ‘टाइम्स’ पत्रांत या पुस्तकावर टीकात्मक लेख दोन प्रकारचे आलेले दिसले. त्यांत प्रत्यक्ष, टीकाकारांपेक्षां अग्रलेखांत कांहीं सौम्यपणा वापरलेला दिसला, तरी प्रचलित राजकारण पुढे सरकण्याकडे ऐतिहासिक ग्रंथांचा उपयोग होणें अवास्तव आहे असा जातां जातां शेरा ठोकून या ग्रंथाकडे पाहण्याच्या दृष्टीत फरक पाडण्याचा यत्न केला आहे. आमच्या मतें केवळ हा शेराच नव्हे तर सर्व टीका देखील एककल्ली आहे. असें करण्यानें पुस्तकाच्या वास्तविक महत्त्वास किंचितहि कमीपणा न येतां उलट त्याची किंमत वाढण्यास असली टीका करणाराचें पक्षपातित्व जास्त उपयोगी पडते.
सन १८१८-१९ मध्ये पेशवाईचा बळी घेतल्यावर तो जिरविण्यास जे उपाय इंग्रजांनी योजले त्यांच्या बुडाशी परोपकारबुद्धीपेक्षां स्वार्थसाधनच होते हे आता उघडकीस येत चालले आहे. `टाइम्स`मधील टीकाकाराचे मते सातारची गादी स्थापन करणे परोपकारित्वाची साक्ष पटविते. डॉ. बसू यानी उद्धृत केलेल्या पुराव्यावरून व इतर माहितीवरून स्वार्थ झांकण्याकरितां परोपकाराची मदत राजनीतीस कशी आवश्यक होते हे मात्र सातारच्या उदाहरणाने स्पष्ट केलें आहे. दिल्लीपासून दिवाणगिरीची सनद घेणारानी आपली दिवाणगिरी चीनचे बादशहास बक्षीस देऊ केली तरी दिल्लीपतीची सार्वभौमिक सत्ता जशी चीनला मिळू शकणार नाही तशीच पेशव्यांनी अगदी सूर्योपरागसमयी ‘अलपिष्टनशर्मणे संप्रददे’ म्हणून जरी पेशवाईचे उदक सोडले सोडले तरी ज्या सातारच्या महाराजांनी पेशव्यांस नेमिले त्या मूळ मालकाच्या. महाराजांच्या स्वामित्वास धोका येण्याचे कारण होत नाही. त्यांतूनहि पेशवाईचे कचाटीतून सोडविण्याकरितांच अवतरलेली ब्रिटिश सत्ता महाराजांस संपुष्टांत ठेवून पुजारीपणा गाजविण्यास जर जन्मास आली तर पेशवाईत व त्या सत्तेत अंतर तरी काय? व अशा वेळी सातारचे राज्य संक्षेपरूपाने अस्तित्वांत आणून त्या वेळच्या स्वराज्याच्या प्रेमानें आधींच आंधळ्या बनलेल्या डोळ्यांत धूळ टाकून पेशव्यांकडील ओढा कमी करून मूळ मालकाकडे त्या वेळचे सरदार लोकांस वळविणे अत्यंत जरूरीचें होतें, असें ती राजनीति शाबीद करीत असतां, परोपकाराच्या बाता निदान सातारच्या इतिहासप्रसंगी तरी, कोणी झोकल्यास पूर्वीप्रमाणे इतउत्तर दिशाभूल होणार नाही अशी खात्री आहे. जास्त पुरावा या बाबतींत कोणास पाहिजे असल्यास अर्ल हेस्टिंग्ज यानी १८२३ साली राज्यधुरा खाली ठेवल्यानंतर जाहाजावर पाय ठेवतांना स्वक्रियासमर्थनार्थ केलेल्या विवेचनांत तो भरपूर मिळतो.
"No act of personal kindness, no obligations of plighted faith, no conviction of almost inevitable ruin, could weigh with the Maratha chiefs against the professed bond of obedience to the heads of their tribes. It was evident that, were such an ostensible superiority to be revived, any compact with Maratha Princes must be nugatory towards the future tranquility of India. It was indispensable to divorce those sovereigns from acknowledged community of interest."
आणखी पुढे स्पष्ट शब्दांत चित्र आहे :
"To have to put the Satara family in possession of the Poona dominions would have been to create a new leader of the Maratha confederacy in whom we have vested all that influence which we had found capable of being so dangerously exerted against us. It was a matter of merest self-defence not to resuscitate such a power."
सातारचे राज्य कसे बुडविले?
असो. अशाच हेतूनें जन्मास आणलेल्या बाळाचे नरडीस नख केव्हा लावावें ह्या प्रश्नाचा देखील विचार जन्माबरोबरच ब्रिटिश राजनीतीने करून ठेवला. अशा वर्तनावर परोपकाराचा मुलामा कोतून टिकणार?
डॉ. बसूंनी हा सर्व प्रकार उघडा करून दाखविला आहे. राजे प्रतापसिंहमहाराज यांचे गोडवे आरंभी आरंभी गाण्यात आले. महाबळेश्वरासारख्या सृष्टिसौंदर्याचे माहेरघरी ब्रिटिश राजनीति शिरतांना देवाण-घेवाणाचा फार्स उडवून खंडाळ्यासारखा उजाड प्रदेश महाराजानी घेतला म्हणून त्यास मोठेपणा देण्यास ती राजनीति कचरली नाही! किंबहुना अशा प्रकारांनी महाराज उदारमनस्क आहेत. एतदर्थ त्या वेळच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सनी देणगीची कमाल करून महाराजांस ३००० रु. किंमतीची तरदार दिल्याचा फक्त हिशेब मात्र ठेवला. ती तरवार महाराजास न मिळतां मध्येंच कोठें गडप झाली कोण जाणे!
महाराजास जो मुलूख तहनाम्यावरून मिळाला त्यांत जहागीरदार होते. त्यांच्यावर सर्व प्रकारची सत्ता महाराजांची रहावी, असे तहनाम्यातील शब्द योजनेवरून दिसत असल्यामुळे महाराज कर्ते झाल्यावर त्याप्रमाणे वागण्यास उद्युक्त होतांच स्थानिक ब्रिटिश अधिकारी यानी जहागीरदारांच्या सावकारांचा पक्ष घेऊन महाराजांचे अधिकाराची विटंबना मांडली. प्रत्यक्ष तहनाम्याविरूद्ध स्थानिक अधिकारी वर्तणूक करू लागले ते बरोबर नाही, असें शेवटी महाराजांनी इंग्लंडमधील कंपनीचे अधिकाऱ्यांकडून ठरवून आणले. ही गोष्ट स्थानिक गव्हर्नरपासून सर्व लहानथोर इंग्रजांस शल्यवत् झाली. त्यांनी इंग्लंडमधील ठराव महाराजांच्या हातीं येऊ दिला नाही. प्रकरण चिडीस गेले. मुंबई सरकारचा अत्यंत पाणउतारा झाला.
ही आणीबाणीची वेळ इंग्रजी कारस्थानानें कशी मारून नेली याचे खरें चित्र डॉ. बसू यानी सरकारदप्तरातील व पार्लमेंटमधील वादविवादाच्या कागदपत्रांवरून उत्तम रीतीने विशद केले आहे. महाराज बंडखोर आहेत, सैनिकांस बिघडवितात व परदेशस्थ राजांशी दळणवळण ठेवून ब्रिटिश राज्य उलथून पाडीत आहेत, अशा बोभाट्याचा मोठा धोंडा दुसऱ्या पारड्यात घातल्यावाचून, महाराजांचे सचोटीचे व राज्यकुशलतेचे पारडें वर उचलण्यास साधन नव्हते. तितकेहि करण्यास त्या वेळचे इंग्रज अधिकारी कसे प्रवृत्त झाले हे या पुस्तकांत स्पष्ट केलें आहे.
हे सर्व धर्मकृत्यच समजायचे, तेव्हां या परोपकारास संकल्प सांगण्यास ब्राम्हणांची उणीव राजनीति कशी राहू देणार? तोहि खेदजनक प्रकार डॉ. बसूनी वर्णिला आहे. अशा रीतीने शह देत प्यादी करण्यास पाइकांची भरती हां हां म्हणतां झाली. झाले, महाराजांस ब्रिटिश सरकारने पदभ्रष्ट करण्याचे ठरविले. तथापि अद्यापि कांगावा पुरा होण्यासारखा नसल्यामुळे महाराजांवरील आरोप व तत्समर्थनार्थ पुरावा महाराजांस स्पष्टपणे न समजावितां. न्यायाच्या कसोटीस न लागण्याइतका डाकलग पुरावा सबळ मानून आणखी एक शक्कल अशी लढविली कीं, सांप्रत तर ती केवळ लुटारूपणाचेच द्योतक समजली जाईल! महाराजांस बोलावून असा एक कागद पुढे टाकला कीं, त्यांत त्यांनी आपण अपराधी आहोत, ब्रिटिश नीति मात्र उदार आहे व करुणा भाकणें हेंच महाराजांस जरूर आहे, असा मजकूर होता. असा कागद त्यांचे सहीकरितां पुढे करणें हे धाडस एक ते इंग्रजच करू जाणत! पण तशाहि बिकट परिस्थितीत, केवळ सत्य व अब्रू हीच मानवी आयुष्यांतील राज्यापेक्षाहि अक्षय्य कमाई आहे, असेंच महाराजांनी ठरवून राज्यास व त्याबरोबर त्या इंग्रज मुत्सद्यांसहि लाथाडून दिलें! अशा प्रकारचें अखिल भारतभूमीत हे एकच उदाहरण आहे आणि त्या ऋणांतून मुक्त होण्याकरितां अशा राजाचे आधुनिक प्रयोगांनी स्मारक व्हावें असें ग्रंथकर्त्याने सुचवून आपल्या ग्रंथानें एक प्रकारें तें काम उरकलेंहि आहे.
महाराजांचे वनवास
आपल्या केवळ पाशवी शक्तीवर अवलंबून हा दुर्बुद्धिबळाचा डाव टाकून महाराजांस वनवासांत सरकारने ओढले. त्यांचेबरोबर शिष्टाचाराकरितां बाळासाहेब सेनापति यांस बळेच दवडून, प्रवासांत हालअपेष्टा सोसण्यास लावल्यामुळे बाळासाहेबांचा अंत होत आहे, असें आगाऊ समजाविले असतां तें थोतांड आहे अशी समजूत करून घेऊन एका निर्घृण अंमलदाराने त्यांचा अंत कसा पाहिला व त्यांचे कुटुंब आसन्नप्रसूतिसमयीं जंगलांत बाळास कसे जन्म देते झाले, वगैरे प्रसंग हृदयद्रावक आहेत. महाराजांची खासगी दौलत वचनाने देऊ केलेली कशी बुडविली. पत्रव्यवहार कसा चोरून पाहिला व लपविला, बाह्यात्कारी कंशी मेदगिरी उपयोगांत आणली. हे सर्व प्रकार सदर पुस्तकांत बसू यांनी चांगले दाखविले आहेत.
राणा प्रतापसिंहमहाराज यांस ता. ५ सप्टेंबर १८३९ रोजी पदभ्रष्ट केले. तेथपासून ते बनारसला पोचून तेथे कायम राहीपावेतों त्यांस कष्ट फार पडले. पुढे ते आठ वर्षे जीव धरून होते. सत्य आपणास तारील म्हणून त्यानी वाट पाहिली. प्रयत्न केले; परंतु ब्रिटिश राजनीति केवळ सत्याला दाद देत नाहीं, असें त्यांस व त्यांच्या उदाहरणानें जनतेस पटले.
स्थानिक अधिकाऱ्यांनी केलेले अत्याचार अशा रीतीने यशस्वी झाले तरी हे उच्छीष्ट कोणाचे फाटक्या पदरात टाकावें ही करमणुकीची गोष्ट सरकारचे लक्षांतून गेली नाहीं. महाराजांचे कनिष्ट बंधु जात्या दुबळ्या मनाचे व भोळसर असल्यामुळे त्यांच्यावर मोर्चेल ढाळल्यावांचून पाप पचणार कसें? तो प्रकार उरकताना देखील त्यांस अपत्याची आशा नाहीं, व लवकरच हिंदुपदपादशाही हे वाक्य देखील कोणाचे कर्णपथावर पडण्यास उरणार नाहीं. हाहि सिद्धांत त्या अधिकाऱ्यांनी ठरवून ठेवला होता! त्या आप्पासाहेबांनी दत्तकाविषयीं हरप्रयत्न करून आगाऊ सरकारास कळविण्यास व पूर्ण समारंभाने दत्तविधान करण्यास कमी केले नाही. पण सर्व जबाबदार इंग्रज तोंड चुकवून आंधळी कोशींबीर खेळणारे झाले! शेवटीं या राज्यास कोणी मालक नाही, ज्यास गोत्र नाही त्याचें गोत्र काश्यप आणि ज्यांस वारस नाही त्याचा वारस राजा, या न्यायानें मृतास गति देणारा इंग्रज पुढे सरसावला. राज्य खालसा झाले व येथे सातारची कहाणी संपली. महाराष्ट्राच्या हृदयात खंजीर खुपसून त्या रक्तानें लाल झालेल्या कुंचल्याने नकाशावर तांबडा रंग दिला!
रंगो बापूजी
ही सर्व हकीकत शून्यहृदयकारी असली तरी तिच्यांत स्वदेशप्रीति व स्वामिभक्ति यांची ज्योत पेटविणारी अशी अनेक स्थलें आहेत. सर्वात विशेष ध्यानांत ठेवण्यासारखे प्रतापसिंहाच्या सत्यप्रियतेच्या तोडीचें उदाहरण त्यांचा निःसीम भक्त व सेवक रंगो बापूजीचेंच होय. उतारवयांत केवळ स्वामिकार्यार्थ इंग्लंडसारख्या हवेंत, हिंदी रिवाज व धर्म पाळून ज्यांनी देह झिजविला अशा राजभक्तांत रंगो बापूजी अग्रणी होत. १८३७पासून चवदा वर्षे त्यांनी श्रीरामचंद्रजीसारखा वनवासच पत्करला म्हटला तरी अतिशयोक्ति होणार नाही. महाराजांवर आणलेले किटाळ किती फोल व खोटें होतें हैं त्यांनी खुद्द इंग्रजांकरवी सिद्ध केले व इंग्लंडांतील सुमारे ६० हजार सह्यांनी १०० वर झालेले अर्ज पार्लमेंटाच्या दप्तरांत दाखल करविले, रंगो बापूजीच्या शिष्टमंडळाची हेटाळणी जाच कुचंबणा कशी करण्यांत आली याचेहि यथास्थित वर्णन ग्रंथकल्पांनी उत्तरार्धात दिलें आहे. ज्या ज्या उदारमनरक इंग्रजांनी आपल्या देशाच्या अब्रूसंरक्षणार्थ महाराजांची बाजू उचलून धरली, त्यांचीहि कामगिरी त्यांनी सोदाहरण रेखाटली आहे. शक्तीशिवाय केवळ युक्ति अगर श्रद्धा निरुपयोगी, म्हणून योगेश्वर कृष्ण व धनुर्धर पार्थ अशी जोड असेल तरच श्री व विजय उपलब्ध होईल, हे जे गीतेचे रहस्य-गीतारहस्य-त्याचा दृष्टांत सातारची कहाणी आहे असे ग्रंथकर्त्यांनी प्रतिपादन केलें आहे.
इंग्लंडातली हल्लींची हिंदुस्थानच्या गाऱ्हाण्यांची दाद लावण्याचा विडा उचललेली British Indian Society किंवा कलकत्त्यास काम करीत असलेली British Indian Association यांचा जन्म रंगो बापूजीच्या कर्तबगारीने झाला. दोन वर्षांपूर्वी ‘इंडिया’ पत्र जें काम करीत होतें तशा प्रकारचे वर्तमानपत्रहि रंगो बापूजीच्या वेळीं जन्मास आलें.
नरेंद्रमंडळ हल्ली एकत्र जमून स्वतःच्या हिताच्या गोष्टी करीत असते; अशा वेळी ब्रिटिश राजनीतीने अधिक प्रामाणिकपणा धरणे किती आवश्यक आहे व मंडळाचे घटकांनी इतिहासांत आपला दर्जा राखण्याकरितां किती समंजसपणा वाढविला पाहिजे, अशा दृष्टीने प्रस्तुतसारखे इतिहास आवश्यक आहेत. स्वार्थ याप्रमाणे स्व शब्द व्यापक न केल्यास राज्यशकट कोणासहि लहानापासून थोरापावेतों, कसा हांकता येणे अशक्य आहे. हे प्रस्तुत ग्रंथाच्या द्वारे डॉ. बसू यांनी सिद्ध केले आहे. पुस्तकाच्या अंतरंगाबरोबर बाह्यांगहि मनोहर करण्यांत आलें आहे. एकंदरीत पुस्तक लोकदरास सर्व प्रकारें पात्र झाले आहे यांत संशय नाही.
(२०) दोन दांगडी पोवाडे
सन १९२२च्या एप्रिलांत, सातारा येथे शिवजयंति उत्सवात प्रतापसिंह आणि रंगो बापूजी या विषयावर माझी ३ व्याख्याने झाली. मराठ्यादि बामणेतर जनतेला तो इतिहास इतका जिव्हाळ्याचा वाटला की काही मराठा शाहिरानी त्यावर दोन दांगडी पोवाडे रचून त्यांचा त्या वेळी गांवोगावी नि खेडोपाडी फैलावा केला. येथे दिलेल्या पहिल्याची पुस्तके छापली होती आणि दुसरा पुणे येथे निघणाऱ्या ‘शिवछत्रपति’ दैनिकाच्या ७ नवंबर १९२२च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. या पोवाड्यांचे शाहीर खेडवळ असतात. नुसते व्याख्यान ऐकून त्यातला तपशील स्मरणाने पोवाड्यांत रचण्याचे काम खरोखरच कौतुक करण्यासारखे असते. म्हणून बामणी पांडित्याच्या काटकोन चौकोनातून या रचनेची किंमत ठरविण्यात शहाणपणा नाही.
ठाकरे
१) कै. प्रतापसिंह महाराज सातारकर यांचा पोवाडा.
(चाल. - उमाजी नायकाची.)
भिक्षुकशाहीचे बंड । नव्हे थोतांड । भटांवर कुभांड | नाहि घेत । सांगतो खरे देवाचि शपथ | शिवजयंतिच्या उत्सवांत । ठाकरे यानि सांगितली मात । तीच मी करतो जनां श्रुत । शाहू करवीरचे भाग्यवंत । इतरांविषयि जसे झटत । प्रतापसिंह महाराज साताऱ्यांत । महाराजांच्या आले तसे मनांत । म्हणून त्यानि केलि असें सुरुवात । पाहावले नाही भटां खचित । पुणेकर भटें झालि दुश्चित । बाळाराव नातू भोरचे पंत । चिंतामणराव सांगलीत । बाळंभट नागो देवराव पंत । महादेव सप्रे आकलवंत । सखाराम महाजनि श्रीमंत । बाळकोबा केळकर गर्वात । कृष्णाजी भिडे येऊनि त्वरित । भाऊ लेले असत्य सदा वदत । सर्वजण मिळून विचार करित । महाराज नसावे राज्यावरतं । युक्ति त्याला काय करावि म्हणत । गोवे सरकारची घेऊन मदत । कंपनी सरकारला घालवू पहात । असा कट महाराज करी गुप्त । रेसिडेण्ट घेऊनि बगलेत । कंपनिला कळवावी हकिकत । भटांचा छळ करितो बहुत । असा भटजीनी करुन बेत । पुण्यामधे दादा ।। १ ।।
आपासाहेब नांव भोसले । बंधु धाकले । फितुर पहा केले । याच भटांनी । राज्याची आशा दाखवूनी । बिभिषण फितूर झाला म्हणूनी । रावणाची झाली धुळधाणी । सुग्रिव फितुर होतांच क्षणीं । रामाने वालि टाकला वधुनी । सत्यसमाजाचि होत हानी । फितुरचा परिणाम लोक आडाणी । गुंजाळ आवटे असुन ज्ञानी । फितुर झाले बामणांचि करणी । पूर्विची अशी माणसे शहाणी । आत्माराम हैबतराव दोनी । नातुकंपुला सामिल होऊनी । खोट्या सह्या शिक्के केळकरांनी । बनावट पुरावा ठेवला करुनी । बामणांचा छळ चाले रात दिनी । पुरावा केला सांगलिकरांनी । शंकराचार्य जगतगुरूनी । खोटि दिलि आज्ञापत्रे लिहुनी । असे सारे ठरून सर्व मतानी । कंपनि सरकारला भेटले जाउनी । गवरनराच्या लागले कानीं । नातु असा राष्ट्राचा अभिमानी । कोंकणस्थ दादा ।। २ ।।
अगोदर होता उल्हास । फाल्गुन मास । कंपनी सरकारास । आनंद झाला ।। महाराजाच्या वतीने असलेला । कैद केले बाळोबा चिटणिसाला । गवनराने हुकूम केला । पुण्याचा तयार करून रिसाला । पलटण जाऊ द्या सातांऱ्याला । आगष्ट एकतीसला बेत ठरला । बातमी माहिति नव्हति कुणाला । सपटंबरच्या चार तारखेला । मध्यरात्रीच्या सुमाराला । राजवाड्याभोवति वेढा दिधला । रेसिडेण्ट वाड्यामधे शिरला । आप्पासाहेब होते बरोबरिला । बोटाने दाखवी महाराजाला । बुवासाहेब महाराज झोपि गेला । झोपेत धरुन मनगटाला । खेचले बघा हो प्रतापसिंहाला । काय देवाने प्रसंग आणला । राजा मग उठुन कि हो बसला । रेसिडेण्ट बोले महाराजाला । कैद करण्याचा हुकुम तुम्हाला । बाकि काहि ठाउक नाहि आम्हाला । चला चला उठा उशीर झाला । महाराज निघाले भीति मनाला । आंगावर वस्त्र नव्हते शेला । बाळासाहेब भोसले सेनापतिला । कैद केले रात्रि त्याच घडिला । किस्टालसाहेब पहारेवाला । लिंब गावात मुकाम नेला । महाराज भेटले गोजरा मुलिला । रडून तिने आकांत लइ केला । मुलीने दादा ।। ३ ।।
महाराज ठेवले काशीत । व्हायचे ते होत । कधी नाहि चुक्त । होणं जाणं ।। सांगायचे एवढेच कारण । शेण्ड्या जानवी राखलि ज्याणं । प्रतापसिंह त्याचे वंश असुन । ज्याचे आजवर खाल्ले अन्न । जरि पण खात आहेत अझुन । हे कोण फडणिस भट म्हणुन । चिंचणेर मिळालं लबाड करुन । हे कोण द्रवीड भट म्हणुन । यवतेश्वर दिले इनाम करून । हे कोण मुतालीक म्हणुन । वेळेगांव दिले इनाम करुन । हे कोण राजगुरू म्हणुन । सासपडे आतीत इनाम करुन । हे कोण श्रोत्री भट म्हणुन । वर्णेगाव दिले इनाम करुन । हे कोण पंडित भट म्हणुन । फत्यापूर दिले इनाम करुन । सातारा तालुक्यावरुन । इतर ठिकाणचे करा अनुमान । सांगताना जीव जाइल दमुन । म्हणून घेतले थोडयात आटपून । भटानो असे असतां जाण । राजावर कसे पडला फिरुन । नव्हे का हे निमकहरामपणा । बामणाला कुणाचि ना ओळखण । कोठवरी देऊ उदाहरणं । भाऊबंदांत आले मरण । जाऊ नये कधी भटां शरण । सर्पाला नमस्कार दुरुन । वागावे हाच नेम धरून । स्वराज्य आधि होते ते घालवून । बसले आपापल्या जागिं जाऊन । गांधि महाराजाना पुढे करून । स्वराज्य आता मागतां भटजि आपण । लाज कशि नाही दादा ।। ४ ।।
स्वराज्यद्रोही शाहू करवीरचे । म्हणती वाचे । भट लोकांचे । लिहिणे खरे का ।। केसरीमधे करूनि टीका । वाजविला हूं मुलखीं डंका । बंधुनो माझे थोडे ऐका । स्वराज्यद्रोही कोण खरे ओळखा । मनामधे धरु नका शंका । प्रतापसिंह महाराजाना नव्हे का । पेशव्यानी कैद केलं होतं का । कंपनीनं त्यांचि करुन सुटका । राज्य दिलं त्यांचं त्याना बरं का । नातुकंपुने पुन्हां दिला चटका । दोन वेळ बसला भटी फटका ।। मराठा समाजाला तिडका । भट्टांची धरता तुम्ही भिड़ का । जसा मालकाने पाळावा एडका । मालकालाच पुन्हां देतो धडका । उंदरानी म्हणु नये गरीब बोका । उमज नाहि कशी आमच्या लोकां । भटाना म्हणुनी काका काका । उलट त्यास पुजूनि देति पैका । खरे क्षत्रिय असाल जर का । जशास तसे वर्तन ठेवाल का । समाधान वाटेल मला बरं का ।। सांगतो ते मुळीच विसरु नका । भट्टांचा संबंध तोडुन टाका । भट्ट हा काका नव्हे बोका । कवि तुकाराम सांगे पक्का । रहाणार कडेगांवचा शिक्का । भट्टाचा लागू न द्या धक्का । असे तुम्ही वागा हो दादा ।। ५ ।।
२) निःशस्त्र प्रतिकार!
(दांगटी चालीवर)
भटब्राम्हणांची डायरशाही । दुष्ट पेशवाई । कलमकसाई । टोला बसला । मराठी राज्याचा मुडदा पडला । पेशवाईत ब्राम्हणाला । थोरपणाचा ऊत आला । नाही गरिबाची दाद त्याला । राज्य मिळविता मराठा झाला । भट मालक परि झाला । जाच अति गोरगरीबाला । गळ्यांत दिली मडकी महाराला । थुंका पडू नये जमिनीला । खराटे बांधले कंबरेला । भुईची पावलेच बुजवायला । अन्नाविण कैक लोक मेला । कमी नाहीं भटभोजनाला । कोणी एक शूद्र खरकट्याला । शिवला भटजींच्या पत्रावळीला । भटपेशव्याला राग आला । सोवळें अन्न मग म्हणाला । शूद्र महारडा कसा शिवला । लाज कशी नाही वाटली त्याला । शीरजोर महार फार झाला । भटलोकानी शेरा दिला । लगेच फाशीचा हुकूम झाला । हिंदुचा धर्म कपाळाला । चुकून जर कुणी पहा लावला । जोडा भटजींनी हाती घेतला । खरवडून लगेच काढविला । कुणी जर वेदमंत्र म्हटला । छळ ब्राम्हणानी त्याचा केला । राज्य मिळविण्या शिवाजीला । धावलें प्रभू मदतीला । त्यांच्यावर गहजब उठला । नारायण भट पेशवा झाला । नऊ कलमाचा आहेर केला । कोणी रस्त्यांत भट दिसला । घालावा दंडवत त्याला । साखळीनें गंधच लावायला । सोवळी धोत्रेंच नेसायला । पानें तुळशीची तोडायला । श्राद्धाचे पिंडही टाकायला । हुकुम बंदीचा त्यांना झाला । भटाचे नांवहि काढायला । भीति असी वाटे इतर जनाला । ज्ञानाविण पशू पंगतीला । सर्व समाज तेव्हां बसला । विद्या शिकण्याचा रस्ता अडला । न्यायनीतिचा खून झाला । असा जुलमाचा लोट उठला । दया मग आली ईश्वराला । घडा पापाचा पुरा भरला । पेशवाईचा अंत झाला । इंग्रजी अंमल सुरु झाला । थोडा न्यायाचा जम बसला । तरीहि ब्राम्हणांनी डाव टाकला । रे ऐकाहो दादा ।। १ ।।
सन आठरा एकुणचाळीस । प्रतापसिंहास । भटाचा फांस । कसा बसला । नातुकंपुच्या ऐका लीला । प्रतापसिंहाच्या अमदानीला । उच्चनीच भेद नष्ट झाला । धर्माची मोकळीक सगळ्याला । पहावेना मुळी ब्राम्हणाला । नातूशाहीला वायु झाला । दुष्ट लोकांनी कट केला । सगळ्यांनी मिळुन विचार केला । भोरचे पंत मदतीला । चिंतामणराव सांगलीला । बाळं भट जोशी भाऊ लेला । कृष्णाजी भिडे कोकीवाला । महादेव सप्रे संगतीला । सखाराम बल्लाळ खडबडला । केळकर बाळू पुढे आला । नागो देवराव झट उठला । कैक ब्राम्हण शेंडीवाला । प्रतापसिंहाचा भाऊ धाकला । आप्पासाब नाव होते त्याला । राज्य हि देतों बघा तुम्हाला । भुलला बघा भटांच्या वचनाला । आप्पासाब सामील त्यांना झाला । आवटे गुंजाळ जसे पुण्याला । लागलेत भटांच्या नादाला । आप्पासाब तसाच भटजीला । सामील झटपट झाला । डाव तर इथेंच फिसकटला । असो कटाचा बेत झाला । झेंडा बंडाचा उभा केला । खोटी बातमी कंपनीला । बेत सांगण्याचा तेव्हा ठरला । प्रथम त्या भटजीनी विचार केला । शंकराचार्य भट, भला । हाताशी घावला बघा त्याला । खोटा कागद तयार केला । सही करण्यास पुढे केला । शंकराचार्य मनी भ्याला । शेंडीची आठवण त्याला । राखिली मराठ्यांनी म्हणाला । जेव्हा भटजींनी धाक दिला । सही करण्यास तयार झाला । चिंतामण भट्ट पुढाऱ्याला । कागद हजर तेव्हा झाला । मोठाल्या शहरांत पेठेला । तसेच खेड्यांच्या चावडीला । प्रतापसिंह हिंदु नव्हे असला । जाहिरनामा भटांनी चिकटविला । वाईट अती वाटे इतर जनाला । सर्व समाज गप्प बसला । इलाज नाही भटांच्या गोष्टीला । याच गोष्टीला काळ गेला । पुढे या चित्त पवाड्याला । भटकंपुचा विचार ठरला । पुढच्या कार्यास आरंभ झाला । रेसिडेंट होते साताऱ्याला । भेटले सर्व जाऊन त्याला । खाली वाकून सलाम केला । उभा जो होता भट पहिला । काय सांगतो साहेबाला । प्रतापसिंह राजा मस्त झाला । भट लोकांचा छळ केला । तुमच्या विरुद्ध कट झाला । कंपनीचें राज्य उलथायला । दोनतीन लाख पटकेवाला । अनुकुल झाला प्रतापाला । साहेब तुम्ही अजुन झोपी गेला । तुम्ही हो झाडाच्या कोणचा पाला । वेळी नाहीं बंदोबस्त केला । हादरून जाईल तुमचा डोला । ध्यान द्या माझ्या बोलण्याला । इतकें सांगून मागे सरला । भटांचा कंपू निघुन गेला । देशद्रोह्यांच्या बघा लीला । ताडकन उठला टोपीवाला । गोष्ट त्याच्या पटली हो ध्यानाला । मनामधिं साहेब तर्कांटला । जर एकदा वीर उठला । आपल्यावर प्रसंग येईल कसला । भटांचीच शिकवण साहेबाला । खरीच वाटणार मग त्याला । लगेच रपोट तयार केला । गव्हर्नर होता मुंबईला । वर्दि जेव्हा गेली हपीसाला । गव्हर्नर गारेगार झाला । ये ऐकतांना दादा ।। २ ।।
नातुकंपूची अशी खटपट । दुष्टांचा कट । गव्हर्नर झट । बघा उठला । रेसिडेंटाला हुकूम दिला । बंदिवान करा महाराजाला । दारिं एक होता पट्टेवाला । हुकुम हातांत त्याच्या दिला । झटपट जावें साताऱ्याला । उशीर जर होईल कामाला । प्रसंग अति वाईट आता आला । पत्र हे द्यावें साहेबाला । शब्द साहेबानें तो उच्चारला । घोड्यावर स्वार पटेवाला । प्रकार मग पुढे काय घडला । हपीसामधुन साहेब उठला । सैन्याच्या बराकींत गेला । हुषार राहण्याचा हुकुम झाला । रिसाला पुण्यांत तयार झाला । वर्दि जाण्याची साताऱ्याला । बातमी ही कळली महाराजाला । नातुकंपुचा बेत कळला । सगळ्या सैन्याचा जमाव केला । प्रतापसिंह काय बोलता झाला । कंपनी येते पकडायला । सगळ्यांनी शस्त्रे द्यावी मजला । कंपनीने त्रास जरी दिला । सोसावें सगळ्यानी जुलमाला । हात मुळी कुणी हत्याराला । लावु नये शपथ माझी तुम्हांला । सेनापति बाळासाहेब भोसला । शस्त्र देईना महाराजाला । महाराज म्हणे सेनापतिला । सत्याची बाजू आपल्याला । प्राणावर प्रसंग जरी आला । शिरच्छेद जरी माझा झाला । घेऊ नये हातात शस्त्राला । नाखुष सेनापति झाला । स्वामीची आज्ञा मान्य त्याला । टाकिली समशेर जमिनीला । दारूगोळा होता कोठाराला । तोही तत्क्षणी बंद केला । शस्त्रहीन बंदोबस्त झाला । प्रकार आतां ऐका दुसरीकडला । मजल मारूनी पुढे आला । रिसाला साताऱ्यात शिरला । मध्यरात्रीच्या सुमाराला । बारावर एक वाजून गेला । राजाचा वाडा ऊंच भला । त्याची माहिती आप्पासाबाला । रेसिडेंटानें हुकूम केला । अचानक छापा आता घाला । एकदम रिसालाच उठला । वाड्याच्या भवती वेढा दिला । रेसिडेंट वाड्यामध्ये शिरला । आप्पासाब होते बरोबरीला । महाराज जिथे झोपी गेला । आप्पासाब दाखवी साहेबाला । छातीचा वीर जेव्हा दिसला । साहेबाचा धीर तेव्हां खचला । मनाचा पुनः घडा केला । एकदम धरले मनगटाला । चहू बाजूंनी वेढा दिला । रे सगळ्यानी दादा ।। ३ ।।
भटलोकांचे हे कारस्थान । होणार म्हणून । माहिती पूर्ण महाराजाला । साहेबाचा हात मनगटाला । झोपेतुन महाराज उठला । आपासाहेब जेव्हा त्याना दिसला । तेव्हा आतड्याला पीळ पडला । काळा ठिक्कर चेहरा झाला । सख्या भावाला कैद केला । भटाची फूस धाकल्याला । काही सुचेना महाराजाला । साहेब म्हणे महाराजाला । कैद करण्याचा हुकूम तुम्हाला । कारण माहीत नाही मजला । उठा हो उशीर आता झाला । वस्त्र मुळी नव्हते आंगाला । वाड्याच्या बाहेर तसा पडला । किल्ल्याकडे पुढा त्यांनी केला । दंडवत भवानी देवीला । मार्ग चालायला धीर आला । सर्व सातारा जागा झाला । मराठी राजा कैद केला । वार्ता पोचली सर्व जणाला । वाड्यापुढे थवा जमा झाला । लोकांनी हंबरडा फोडला । पाणी आले राजाच्या डोळ्याला । महाराज समजावी सगळ्याला । येऊ नये प्रसंग तरी आला । सर्व जण जायें आपल्या घराला । इतक्यामध्ये कोणी एक भला । दयेचा सागर पाझरला । अंगावर होता त्याचा शेला । उघड्या राजाला त्याने दिला । झाली सुरवात जबानीला । साहेब म्हणे महाराजाला । तुम्हीतर मोठा कट केला । कंपनीचे राज्यच उलथायला । कागद पुढे त्यानी केला । करा सही आता याच वेळेला । महाराज म्हणे साहेबाला । प्राण जरी माझा निघून गेला । सही करणार नाही बोलला । खोटा कागद असून बोला । सही कशी मागता मराठ्याला । धमकी साहेबाची महाराजाला । राज्य हे जाईल बघा लयाला । प्रतापसिंह बोले साहेबाला । राज्याची किंमत दुबळ्याला । सत्याची चाड मराठ्याला । जरी शिरच्छेद माझा झाला । सही मिळणार नाही तुम्हाला । साहेब मनी थक्क झाला । तरी पण कैद केले त्याला । इथंतर बराच काळ गेला । साहेब म्हणे चला चला । लागले सर्वहि चालायला । दीड दोन तास काळ गेला । लिंबगावात मुक्काम झाला । सर्व गोऱ्यांचा तळ पडला । जो तो आपल्याच जागी गेला । पडके एक घर महाराजाला । म्हशीच्या गोठा नशिबाला । गादीगिरदीचा काळ गेला । क्रिस्टाल साहेब पहाऱ्याला । त्यानें कडकडीत पहारा केला । पांच वाजण्याच्या सुमाराला । एक आवाज ऐकू आला । मनामधि क्रिस्टाल घाबरला । बाई एक आली त्याच वेळेला । क्रिस्टाल लागला विचारायला । बाई तुम्ही कोण सांगा मजला । गोजराबाई म्हणतात मजला । भेटु या मला महाराजाला । त्यांची मी ही मुलगी त्रास झाला । साहेब मनात समजला । आत जाण्यास रुकार दिला । महाराज बसले होते भुईला । हात लावुनी कपाळाला । इतक्यामधी मुलगी भेटली त्याला । मुलीचा गळा भरून आला । तोंडातून शब्दच उमटायला । वेळ फार झाला हो मुलगीला । गुराचा गोठा जेव्हा दिसला l रड्याचा हुंदका आला तिजला । म्हणे आज प्रसंग आला कसला । पोटाशीं घरी राजे तिजला । उगी करण्याचा यत्न केला । मुलीने रडुन आकांत केला । अश्रुनें भिजून सर्व काला । चेहरा गोरामोरा झाला । दुःखाचा कडेलोट झाला । काळजात धक्का तिच्या बसला । इतक्यामध्ये गर्भपात झाला । रे मुलगीचा दादा ।। ४ ।।
ऐसे भटजी चालले खेळ । निष्ठुर काळ । मानाला पीळ । आता पडला । किती तरी क्रूर यांच्या लीला । मुलीचा गर्भपात झाला । रवाना केली साताऱ्याला । लिंबचा तळ पुढे हलला । पुण्यामधि दाखल झाला । काशिला महाराज पाठविला । डेप्युटेशन गेले विलायेतला । इकडे राजाचा अंत झाला । देशद्रोही म्हणती मराठ्याला । लाज नाही वाटत ब्राम्हणाला । राज्याची हाव फार जातीला । आनंदी भटीण राघोबाला । सुख दुखण्यास आनंदे झाला । गुप्त कटाचा बेत झाला । संख्या पुतण्याचा खून केला । नाना फडणीस अक्कलवाला । दडपले महादजी शिंद्याला । राघू भट तसा कोकीवाला । मिळाला जाऊन इंग्रजाला । तसा एक पुण्यामधला । त्रिंबका भटजीचा खून केला । ऐशा भटजीच्या साऱ्या लीला । बत्तीस दांत माणसाला । तेहतीस दांत ब्राम्हणाला । केळकर नरसू केसरी वाला । असहकारितेस रुकार दिला । दुटप्पी नेहमी वागण्याला । पोटाची खळगी भरण्याला । चळवळिस राजीनामा दिला । बहिष्कार म्हणती विदेशाला । कोट बूट आणि पाटलोणीला । चहा लिप्टनचा दारू प्याला । मागे नाही कुणी भट फिरला । असा भटजीचा नेहमी काला । राजकारणाचा चुरा झाला । कोणी असला भट दिसला । थारा नका देऊं राक्षसाला । विषाचा प्याला जर असला । कोण नमुन्यास घेईल बोला । सदानंदानें पोवाडा लिहिला । निजाम पाडळीचा राहाणेवाला । ध्यान द्या माझ्या बोलण्याला । रे वागतांना दादा ।। ५ ।।
- शिवछत्रपति, दैनिक, पुणे, मंगळवार, ता. ७ नवंबर १९२२.
(२२) जंगली महाराज ऊर्फ शहाजीराजे यांची समाधी
प्रतापसिंह महाराजानी काशी येथे दत्तक घेतलेले जंगली महाराज ऊर्फ शहाजीराजे भोसले यांची समाधी पुणे येथे भवानी पेठेत आहे. परवा ता. १ जानेवारी १९४८ रोजी त्या समाधीच्या दर्शनासाठी जाऊन तेथे घेतलेले फोटो इतरत्र छापले आहेत. समाधी मंदिर भक्कम काळ्या दगडांच्या चिऱ्यांचे असून आत शहाजी राजांची समाधी आहे. मंदिराच्या मागल्या मितीवर संगमरवरी शिळेवर -
श्रीमंत शहाजी प्रताप
सिव्ह महाराज छत्रपती
सातारकर जन्मसन १८४०
मृत्युसन १८९२
असा लेख आहे. समाधीवर अशीच एक लहानशी संगमरवरी शिळा असून त्यावर
सत्यमेव जयते... ब्रम्ह सत्यम् जगत् असत्यम्... सत्यात् नास्ति परो धर्म : एकमेवाद्वितीयम
इत्यादि वचने खोदलेली आहेत. समाधीची मोडतोड झालेली असावी, असे दिसते. कारण सध्याची समाधी कांक्रीट सिमेण्टाने लिंपून काढलेली दिसते. मंदिरात सर्वत्र घाण पडलेली आढळली. शेजारचे एक मारवाडी सज्जन आहेत. ते रोज तेथे संध्याकाळी एक पणति लावतात. समाधीच्या आसपास क्रिश्चन मुसलमान हिंदू अशी मजूरवसति आहे. सध्या ही मिळकत बारामतीचे रावबहादुर दत्तात्रेय गणेश शेम्बेकर या श्रीमंत सावकाराच्या मालकीची आहे आणि एस. एस. नवरे त्यांचे व्यवस्थापक आहेत. माझी या सज्जनाना जाहीर विनंती आहे की महाराष्ट्रातल्या एका थोर पुरुषाच्या या समाधीकडे त्यानी किंचित आत्मियतेने पाहून, त्याच्या पूर्व वैभवाला साजेशोसी त्याच्या समाधीची व्यवस्था ठेवावी. सदरहू मजूरवसतीचे दरमहा १०० रुपये भाडे येते. त्यातले अवघे १०-११ रुपयेच जरी या समाधीच्या पुजेसाठी नि स्वच्छतेसाठी खर्च झाले, तर त्यात रावबहादुरांचाच लौकीक होणार आहे.
ठाकरे
परिशिष्ट - समाप्त
सन १८१८ ते १८५७ च्या कालखण्डाचे सिंहावलोकन
(सातारच्या राज्यक्रांतीचा हा इतिहास लिहिताना तत्कालीन राजकारण, सामाजिक दुही, धर्माच्या कल्पना यांविषयी वेळोवेळी मनात जे तरंग उठले आणि या विशिष्ट कालखण्डाच्या इतिहासाला ठरावीक सांप्रदायिकानी भलभलत्या मुरडी घालून आपले राजकारणी स्तोम माजविण्याचा तडाखा कसा चालू आहे. याविषयी या सिंहावलोकनात माझे स्वतंत्र विचार वाचकापुढे मांडीत आहे.
के. सी. ठाकरे.)
केवळ सत्यशोधनाशिवाय आणखी इतर कोणत्याहि हेतूने अथवा भावनेने मी हा सातारच्या राज्यक्रांतीचा इतिहास लिहिला नाही. मऱ्हाठ्यांच्या किंबहुना सबंध हिंदुस्थानच्या इतिहासात या सातारा प्रकरणाला अलबत एक मोठे महत्त्वाचे नि जिव्हाळ्याचे स्थान आहे. परंतु उपलब्ध इतिहास ग्रंथांत आजवर त्याचा सारांशानेच उल्लेख झालेला आढळतो. या प्रकरणावर कोणीतरी स्वतंत्रच ग्रंथरचना केली पाहिजे. हा रा. ब. गोविंदराव सरदेसाई यांचा इषारा वाजवी आहे आणि त्यांचा या ग्रंथलेखनाने आज मी सत्कार करीत आहे. त्यांच्या मराठी रियासत उत्तर विभाग ३ मध्ये, प्रतापसिंह आणि रंगो बापूजी यांची बरीच माहिती दिलेली आहे. कै. विश्वनाथपंत राजवाडे यांनी दादजी नरसप्रभू गुप्ते देशपांडे यांच्या वेळचे फार जुने कागद मिळवून, ते आपल्या १५ व्या खंडात छापण्याची अभिनंदनीय कामगिरी बजावलेली आहे. प्रो. नारायणराव केशव बेहरे यांनी आपल्या सन १८५७ ग्रंथाच्या सुरुवातीलाच सातारा येथील कादंबरी म्हणून एक छोटेसे मार्मिक प्रकरण लिहिले आहे. इतिहासाच्या कल्पित कादंबऱ्या बनवून, त्या इतिहासाच्या भावाने नि मोलाने बाजारात फैलावण्याच्या चालू मन्वंतरात, या मथळ्याने वाचकांचा बराच गोंधळ उडवला असण्याचा संभव आहे. साताऱ्याच्या राज्यक्रांतीचा इतिहास कादंबरीसारखा चित्ताकर्षक नि रसाळ तर खराच, पण त्याला `कादंबरी` ठरविणे चूक आहे. तात्पर्य, छत्रपति प्रतापसिंह नि रंगो बापूजी यांच्या बहुरंगी चरित्राचा स्वतंत्र नि भरपूर तपशिलाचा मेजर बसू यांच्या ‘स्टोरी ऑफ सातारा’ या इंग्रेजी ग्रंथानंतर मऱ्हाठीत तरी हाच पहिला स्वतंत्र ग्रंथ होय. मी जर हा लिहिला नसता, तर महाराष्ट्रात नि मऱ्हाठी भाषेत इतर कोणीहि तो लिहिला नसता, असे माझे मन आजहि मला ग्वाही देत आहे. कारणे उघड नि स्पष्ट आहेत. इतिहास लिहिण्याचा नि छापण्याचा धंदा करणारा महाराष्ट्रातला ब्राम्हणवर्ग स्वताच्या वर्तमान राजकारणी महत्त्वाची मांड सावण्याच्याच धडपडीत असता. पूर्वजांच्या राजकारणी बदफैलीचे आणि सामाजिक गुण्डगिरीचे सत्य चव्हाट्यावर मांडण्याइतका प्रामाणिक नाही.
या इतिहासातला प्रत्येक मुकाबला जसा घडला तसा सरळ नमूद केला आहे. जात्यंधतेच्या किंवा वर्तमान राजकारणाच्या एकाद्या विशिष्ट पथाभिनिवेशाच्या विकारी चष्म्यातून न पहाता, चोराला चोर आणि सावाला साव ठणकावून ठरविण्याइतकी निस्पृहता मी कसोशीने वापरली आहे. कल्पनेच्या पतंगी पंखावर आरूढ होऊन उपमा अलंकार नि उत्प्रेक्षांच्या भावना थयथयाटानी वाचकाना रंजविण्याचे, खिजविण्याचे, भेदरविण्याचे किंवा त्याच्या भावना चेतविण्याचे सावरकरी तंत्र मी कोठेहि वापरलेले नाही. घडला प्रसंग तो असा, हा त्याचा पुरावा आणि हा असा त्याचा खरा इतिहास, यापेक्षा भरंसाट कविशैलीच्या फंदाने इतिहासाची कादंबरी किंवा प्रचारतंत्री काव्य बनविण्याचे सध्या बरेच बोकाळलेले पाप मी कटाक्षाने टाळलेले आहे. मी त्याचा तिटकाराच करतो.
हा इतिहास काय शिकवतो?
या इतिहासाचे संशोधन नि लेखन चालू असताना हिंदुस्थानात ब्रिटिश राजवट होती. तो बाहेर पडताना ती नष्ट झालेली आहे. तरीहि तिच्या पळत्या पावलांच्या पडछाया अझूनहि येथे पडलेल्या दिसतात. राज्यक्रांतीच्या या संधिकाळात, ब्रिटिशांची राजनीति या देशात का नि कशी रुजली, थरारली आणि भरारली. याचा अभ्यास करणे जसे अगत्याचे आहे, तसे आमच्या मऱ्हाठी समाजबांधवांची समाजनीति, धर्मविचार, राजकारणी स्वार्थ नि नालायकी मऱ्हाठशाहीच्या नाशाला किती नि कशी कारण झाली. याचाहि विचार चालू घडीला महत्वाचा ठरेल, अशा अभ्यासाला सत्याची चाड पथ्यासारखी कडकडीत पाळावी लागते. जुने तेवढे सोने, आमचे पूर्वज मोठे धोरणी राज्यकर्तृत्ववान होते, मराठशाही किंवा पेशव्यांची ब्राम्हणपद पातशाही म्हणजे राज्यकर्तृत्वाचा एकमेव चोखट नमुना अशा खोट्या अहंकारी अभिमानाने त्यांचे नागडे. उघडे दोष, बेफाट काव्यशैलीच्या विरळ शेल्याने झाकून टाकण्याचे कर्म फार सोपे असले, तरी असला दांभिकपणा फार काळ लोकाना फसवू शकत नाही. जुन्याचा अभिमान काही मर्यादेपर्यन्त कितीहि वाजवी असला, तरी काळाच्या तुफानी प्रवाहात यच्चावत कल्पनांचि नि भावनांची उलथापालथ अखंड चालू असते. हे नजरेआड करून भागणार नाही. सन १८१८ ते १८५७ पर्यन्तच्या कालखंडात आंग्रेजी सत्तेला शिरजोर बनविण्यात आमच्या सामाजिक धार्मिक नि राजकारणी नीतीचे स्वरूप किती समाजद्रोही बनले होते, याचे अनेक पित्तशुद्धिकारक घडे या इतिहासाच्या अभ्यासाने मऱ्हाठमंडळाला घेता येतील, असा मला विश्वास वाटतो.
इतिहासाची कादंबरी बनविणारे शाहीर
ठराविक क्रांतिवादी मतप्रणालींचा धंदेवाईक प्रचार करण्यासाठी. कल्पकतेचा भावनोदीपक मसाला भरपूर घातलेली वस्तुस्थितीला सोयीस्कर मुरड घालून कादंबरीच्या धाटणीने लिहिलेली अनेक क्रांतिकारकांची चरित्रे आजकाल बाहेर पडत आहेत. इतिहाससिद्ध सत्याला मन मानेल ती मुरड घालून, वाटेल त्या मुकाबल्याचा इतिहास नाटके कादंबन्याच्या रूपाने लोकांपुढे मांडून, त्याच्या स्वदेशाभिमानाला चेतविण्याचे आणि त्याचबरोबर ठराविक सांप्रदायीक मतांच्या पुरस्काराचे नि प्रसार प्रचाराचे बदकर्म आजवर अनेक मऱ्हाठी लेखकानी केलेले आहे. ‘नारायणराव पेशव्याच्या खुनाचा फार्स’, ‘पानपतचा मुकाबला’, ‘पानपतचा मोबदला’, ‘राणा भीमदेव’, ‘तोतयाचे बंड’ इत्यादि नाटकानी धडधडीत खोटे इतिहास रंगभूमीवर नाचवून, लोकमताच्या प्रतारणेचे कर्म केलेले आहे. अलिकडे `प्रभात`च्या `रामशास्त्री` बोलपटाने तर या बदकर्मावर कडी करून, महाराष्ट्राची बदनामी तमाम हिंदुस्थानभर फैलावण्यात वस्तुस्थितीचा नि ऐतिहासिक सत्याचा खून पाडला आहे. असल्या खटपटींचा महाराष्ट्रात एक हि शहाण्या पुढाऱ्याने कधि निषेध केला नाही. उलट त्या नाटके कादंबऱ्यांच्या लेखकाना समाजात मानमान्यता मिळायची. मोठे इतिहास-संशोधक म्हणून त्यांची वहावा व्हायची. मध्यंतरी हा प्रघात किंचित थंडावला होता. परंतु मऱ्हाठी क्रांतिकारक तात्याराव सावरकर यानी सन १९०८ साली (म्हणजे, ऐतिहासिक सत्याना मुरड घालन इतिहासाची चैतन्यप्रेरक कादंबरी किंवा काव्य बनविण्याचे आणि हिंदवी अथवा ब्राम्हण वीर वीरांगनांच्या अंगी असतील नसतील ते सारे सद्गुण चिकटवून. त्याना अपटुडेट राजकारणी जाणिवेचे देशभक्त बनविण्याचे युग चालू असताना) लिहिलेल्या ‘१८५७चे स्वातंत्र्य समर’ ग्रंथाच्या कालपरवाच्या पुनर्जन्मापासून तर तो प्रकार पुन्हा बेगुमान नाचू लागला आहे. चालू घडीच्या उत्क्रांत राजकारणी सिद्धांतानी नि विचारानी ७५-१०० वर्षापूर्वीचे हिंदी नि ब्राम्हण क्रांतिकारक फुरफुरले होते, आंग्रेजाना हुसकावून देवून हिंदुस्थानात लोकसत्ताक राज्य स्थापण्यासाठी ते सारे धडपडले नि अखेर फासावर किंवा अंदमानात गेले, असली बेछूट विधाने कल्पित कादंबऱ्यांच्या पचनी पडली तर पडोत. पण असल्या वाह्यात खरडेघाशीला इतिहास म्हणता येणार नाही.
क्रांतिकारक म्हणे लोकशाहीसाठी झगडले!
१८५७चा उत्तर हिंदुस्थानातला उठाव हे स्वातंत्र्यसमर होते. का असंतुष्ट शिपायांचे बेदरकार बेशिस्त आणि निर्नायकी बण्ड होते, याचा निर्णय निस्पृह चिकित्सकांनी कधीच दिलेला आहे. धोंडोपंत नानासाहेब, तात्या टोपे, झांशीची राणी किंवा सन १९७८-७९ सालचा वासुदेव बळवंत फडके, हे वीर नि वीरांगना अंग्रेजांचा काटा काढण्यासाठी प्राणाचे मोल देऊन झगडले, हे स्पष्ट सत्य असले, तरी ते हिंदुस्तानात लोकसत्तात्मक प्रजासत्ताक देशी जनतेचे लोकशाही सरकार स्थापन करण्यासाठी झगडले. या विधानानी भोळसट नि बेसावध वाचकाना भुरळविण्याचे कर्म फार सोपे आहे, पण ऐतिहासिक सत्याची ती धडधडीत पायमल्ली होय. पेशवाईच्या पुनरुद्धारापलिकडे यांपैकी एकाहि वीराची राजकारणी कल्पना उत्क्रांत झाल्याचा दाखला नाही. लोकशाही कशाशी खातात आणि प्रजासत्ताक तंत्र कशाशी पितात, याची ज्या लोकाना स्वप्नातहि काही कल्पना असणे शक्य नव्हते, त्यांच्या माथी त्या कल्पनांचा शेन्दूर बळेच थापायचा, तर मोटारबाईकने शिवाजी रायगड चढत असे आणि सुरतेवर हल्ला चढवायला त्याने आपले मावळ्यांचे सैन्य डाकोटा प्लेनमधून नेले. असे विधान करायला हरकत कोणती? जेका मऱ्हाठी पंडिताने शिवाजीला निर्भेळ कम्युनिस्ट ठरविलाच आहे. आमच्या खेड्यांतल्या अलुत्या बलुत्या पंचायतीना डॉ. अॅनी बेझंट बाईनी ब्रिटिश पार्लमेण्टाची माता ठरवून त्या मोकळ्या झालेल्या आहेत. नाना फडणीस तर काय, मऱ्हाठशाहीचा म्हणे एकमेव परमेश्वर! त्यांच्या मंदिर स्थापनेच्या खटपटी आटोकाट चाललेल्या आहेत, अष्टे वाळकीच्या लढाईतून पळ काढताना, रावबाजीने आपल्या बायकोला चिटाचा पुरुषी झगा पांघरून घोड्यावरून आपल्या बरोबर पसार केली म्हणून ठाण्याचे मयत इतिहाससंशोधक श्रीमंत भावे यानी तिला ‘वीरांगना’ ठरविली! याच महाशयानी शिवाजीचा आजा मालोजी याच्या खोपटात अग्निहोत्राचे कुण्ड असल्याचे सांगून, शिवाजीच्या गळ्यात जानवे आणि कपाळावर ब्राम्हणमान्य क्षत्रियत्वाचा शिक्का असल्याचेहि विधान ठासून केले आणि राजाभिषेकाच्या बाळाजी आवजीच्या भीमप्रयत्नाना ‘रिकामटवळ्या खटपट्यांच्या लटपटी’ ठरवून ते निजधामाला गेले. असल्या गप्पा बेधडक लिहून छापून लोकांची दिशाभूल नि सत्याची पायमल्ली करताना पूर्वी कोठेच कोणी कोणाला काही अटकाव केला नाही नि आज करीत नाहीत, तर १८५७ च्या बण्डवाल्यांवर लोकशाहीच्या प्रस्थापनेचा मुखवटा चढविणारांचा हात धरणार कोण?
प्रजासत्ताक, लोकशाही राष्ट्रीयत्व या साऱ्या कल्पना आंग्रेजी संघर्षानेच आम्हाला शिकविलेल्या आहेत. राजाशिवाय राज्य असणेच कसे शक्य? एवढेच राज्यतंत्राचे मर्म हिंदी नि मऱ्हाठी लोकाना माहीत होते. मग तो राजा हिंदू असो वा मुसलमान असो, दिल्लीचा बादशहा असो, अयोध्या लखनौचा नवाब असो, झांशीची राणी असो. सातारचा छत्रपति असो अथवा छत्रपति मालकाला धतुरा दाखवून पुण्याला एकछत्री ब्राम्हणी बादशाही थापणारा श्रीमंत पेशवा असो. चालू घडीला (सन १९४७-४८) मोठमोठ्या राजकारणी पंथाच्या नि पक्षांच्या लोकशाहीच्या कल्पना नि वल्लाना, अनेक घड्याळाच्या वेळांप्रमाणे परस्पराशी विसंगत नि विसंवादी असलेल्या स्पष्ट दिसतात. तर १८५७ सालच्या किंवा त्यानंतरच्या (अगदी सावरकरांच्या अभिनव भारत संस्थेच्या वेळच्या) क्रांतिकारकांच्या खटपटी शुद्ध लोकसत्तेच्या स्थापनेसाठीच होत्या, असे अट्टहासाने प्रतिपादन करण्यात, काही ठराविक मतप्रणालीचा ‘प्रचार’ असला तरी तो इतिहासाच्या सत्यप्रतिपादनाचा ‘प्रकार’ मात्र खास नव्हे.
वस्तुस्थिति कशी होती?
१८५७ च्या उत्तर हिंदुस्थानी उठावात खरे पाहिले तर कोणी पुढारीच नव्हता. ज्या नामांकित व्यक्ती त्यात मागाहून घुसल्या किंवा घुसडल्या गेल्या, त्याच्या हेतूंचा शोध घेतला तर चमत्कारिक भानगडी बाहेत येतात. बी बियाण्यासकट अंग्रेज येथून खरचटून काढला पाहिजे. एवढ्यापुरती सगळ्यांची एकवाक्यता असली तरी हिंदुस्थानसारख्या प्रचण्ड खंडाकडून हे महान कार्य एकसूत्री घडवून आणण्यासाठी राष्ट्रीयत्वाची जी भावना लागते (आणि जी आज आम्हाला माहीत असूनहि आमच्या आचार विचारांत असून पुरेशी भिनलेलीहि नाही.) तिचा तर कोठेहि ठावठिकाणा नव्हता. धोंडोपंत नानासाहेब काय, किवा झांशीची राणी काय दोघेहि तत्कालीन लोकमान्य सरंजामशाहीचे कट्टे पुरस्कर्ते. आंग्रेजी बनिया कंपनीने देशी राज्ये भराभर खालसा करण्याचे यंत्र चालू केल्यामुळे, राजे महाराजे संस्थानीक नि जहागीरदार मंडळींची तारांबळ उडाली. त्यांच्या सरंजामबाजीवर ऐतोबासारखी जगणारी बाण्डगुळे आजूबाजूला शेकड्यानी मोजण्याइतकी असली, तरी आपल्या अन्नदात्यासाठी किंवा राजासाठी प्राण पणाला लावणाऱ्या प्रजेचा पाठिंबाहि त्याना नव्हता. सगळी संस्थाने नि जहागिऱ्या. पोटभरूनी आरपार उफलेल्या होत्या. इतक्यात काडतुसांच्या भानगडीवरून आयत्याच खवळून उठलेल्या ठिकठिकाणच्या हिंदू मुसलमान शिपायांच्या पलटणींच्या उठावात आपणहि आंग्रेजाशी होड घेण्याची संधि साधली, तर कदाचित आपली गेलेली नि जाणारी संस्थाने, जहागिरी नि वंशपरंपरेची इनाम वतने आपल्या हातात टिकून रहाण्याचा बराच संभव आहे. इतक्याच नि एवढ्याच चिमुकल्या हेतूने ते सारे बादशहा, नवाब, धोंडोपंत आणि लक्ष्मीबाई १८५७ च्या हलकल्होळात सामील झाले. धोंडोपंत नानाची सालिना आठ लाखाची चंदी आंग्रेजानी तोडली नसती. झाशी संस्थानचा दत्तक मान्य करून ते खालसा करण्याचे त्यानी टाळले असते. तर नानासाहेब नि लक्ष्मीबाई या बण्डाळीच्या भानगडीत मुळीच पडले नसते, यात संशयाला जागाच नाही. स्वताच्या सरंजामशाहीला आग लागते आहेसे पाहूनच ते दोघे आणि इतर बादशहा नि नबाब वगैरे त्या शिपायांच्या धुमाळींत स्वार्थाचे हात धुवून घ्यायला घुसले. नानासाहेब तर चक्क मनाच्या विरुद्ध त्या कल्होळात ओढला गेला. म्हणूनच कानपूरच्या पहिल्याच मुकाबल्यात पराभवाचा दणका खाताच, बिथूरहून आपले चंबूगबाळे आटपून, वनवासात निघून गेला. सारांश, दिल्लीचा बादशहा आपल्या बादशाही सत्तेच्या टिकावासाठी झुरत होता. नबाब आपल्या नबाबीसाठी जीव टाकीत होते. बिथूरच्या धोंडोपंताला पुण्याच्या पेशवाईच्या पुनरुद्धाराची स्वप्ने पडत होती. दत्तक नामंजूर करून झांशीहि अंग्रेजानी खालसा केली म्हणून राणी लक्ष्मीबाई वाघिणीसारखी चवताळून उठली होती. ही सारी मंडळी हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी, येथे लोकशाही प्रजासत्ताक स्वराज्य स्थापन करण्यासाठी सत्तावनच्या स्वातंत्र्य समरात सरसावली होती. असल्या बेछूट विधानानी नाटके कादंबऱ्या रंगल्या, व्याख्यानांत सपाटून टाळ्या कडाडल्या किंवा ठरावीक सांप्रदायीक पंथवाल्यांची वर्तमान राजकारणी दंगलीत हंगामी वहावा झाली, तरी इतिहासाला ही थापबाजी लवमात्र सहन होणारी नव्हे.
वासुदेव बळवंताचे बण्ड
या सत्तावनी मंडळीनाच काय, पण पुढे सन १८७८-७९ साली आंग्रेजांचा महाराष्ट्रातून काटा काढण्यासाठी सर्वस्वावर निखारे ठेवून उठलेल्या वासुदेव बळवंत फडके या शिरढोणकर मर्दालाहि लोकशाहीची किंवा प्रजासत्ताक राज्याची काहीच कल्पना नव्हती. आंग्रेजाना महाराष्ट्रातून हुसकावण्याच्या आपल्या प्रयत्नाना बाहेरच्या हिंदुस्थानातून काही पाठबळ मिळेल किंवा नाही. याचाहि फडके यानी काही प्रयत्न किंवा विचार केल्याचे दिसत नाही. आंग्रेज दख्खनपार झाला म्हणजे तो भारतपार झाला, इतकी भोळसट समजूत त्याची खास नसावी, कुलाबा, पुणे आणि सातारा या तीन जिल्ह्यातच त्याच्या दंगली चाललेल्या असताना तो पकडला गेला. महाराष्ट्रातून अंग्रेजाना हुसकावल्यानंतर स्वराज्य स्थापन करायचे म्हणजे काय करायचे? तर पुणे राजधानीत श्रीमंत पेशव्यांच्या ब्राम्हणपद पातशाहीची पुनर्स्थापना! यापेक्षा विशेष राजकीय क्रांतीची त्या मर्दाला विशेष काही कल्पना असल्याचे दिसत नाही. म्हणूनच त्याने आपल्या एका जाहीरनाम्यावर ‘पेशव्यांचा नवा मुख्य प्रधान वासुदेव बळवंत फडके’ अशी सही केलेली होती. या वेळी वास्तवीक पेशव्यांचा निवेश झालेला होता. तशीच सातारच्या छत्रपतीच्या मूळ राजगादीचीहि विल्हेवाट लागलेली होती. महाराष्ट्राच्या स्वराज्याची मूळ राजगादी छत्रपतीची पेशवे छत्रपतीचे नोकर, पण वासुदेव बळवंताने छत्रपतीचे नांव घेतले नाही. महाराष्ट्राच्या सर्व सुखाचे आगर फक्त पुणे नि पेशवाई, एवढीच त्याची भावना आणखी एका ठिकाणी ‘दुसऱ्या शिवाजीचा मुख्य प्रधान’ अशी सही त्याने केली आहे. पण हा दुसरा शिवाजी कोण? याचा थांग लागत नाही. अलिकडे प्रसिद्ध झालेल्या फडक्यांच्या चरित्रावर व्याख्याने देणान्या मंडळीनी मात्र खुद्द वासुदेव बळवंतच आपल्याला दुसरा शिवाजी, म्हणजे आद्य छत्रपति शिवाजी महाराजांचा अवतार समजत असे, असा अर्थ बसविण्याचे धाडस चालविले आहे. आज उत्क्रांत होत असलेल्या लोकशाहीच्या किंवा लोकराज्याच्या कल्पना जुन्या क्रांतिकारकाना अवगत नव्हत्या, म्हणून त्यांच्या पराक्रमाची त्यांच्या लोकोत्तर धाडसाची आणि त्यांच्या देशस्वातंत्र्याच्या तळमळीची किंमत मुळीच कमी होत नाही. पण त्याना त्या कल्पना होत्याच होत्या असा काल्पनीक कांगावा करणाऱ्या त्यांच्या चरित्रकार शाहीरांच्या हट्टवादीपणाची मात्र शिसारी येते. त्यांच्या बौद्धिक दारिद्याची इतिहासाभ्यासू कीवच करतील. हे चरित्रकार त्या थोर क्रांतिवीरांच्या वाजवी माहात्म्याला निष्कारण डागळण्याचे घोर पाप का करताहेत कोण जाणे!
बंडवाल्यांत एकीची बेकी कां झाली?
परका आंग्रेज आमच्या देशात नसावा. त्याच्या राज्यसत्तेला उखडून हद्दपार केली पाहिजे, आमच्या देशात आमची राज्ये (म्हणजे लोकसत्ताक हिंदवी स्वराज्य नव्हे तर) जागोजाग विखुरलेली हिंदु मुसलमानांची सरंजामशाही सत्ता वंशपरंपरेने अबाधीत राहिली पाहिजे, हा दक्षिणी उत्तरी क्रांतिकारकांचा हेतू एकच होता. ५७ चा उठाव सुरुवातीला जरी या एका उद्देशाने झाला, तरी ‘‘नानासाहेब तात्या टोपे, झांशीची राणी यांचा विचार पेशवाईचा उद्धार करावा असा होता आणि तसा पुकाराहि त्यानी ग्वालेरीस केला. पण महाठ्यांची सत्ता फिरून प्रस्थापित व्हावी, ही गोष्ट मुसलमानांस व रजपुतांस बिलकूल पसंत नव्हती. उलट पक्षी, तात्या टोपे, झांशीचा राणी वगैरेनी नानासाहेबाचा पुरस्कार केला. बादशहास पाठिंबा दिला नाही. याकरून काही फलप्राप्ती होण्यापूर्वीच मऱ्हाठे व मुसलमान अशी दुही आरंभीच झाली होती."
(ब्रिटिश रियासत, उत्तरार्ध, पान ४९०)
पुण्यातल्या नि महाराष्ट्रातल्या ब्राम्हणांना पेशवाई म्हणजे रामराज्यावर ताण वाटत असली, तरी दक्षिणी उत्तरी इतरेजनांच्या त्या राज्याबद्दल किती तिटकाऱ्याच्या भावना असत. हे १८५७ च्या उठावातहि सिद्ध झाले होते. आजहि तोच पेशवाईचा अभिमान महाराष्ट्रात बामण बामणेतर दुफळी माजवून बसलेला आहे. महाराष्ट्रातल्या अखिल ब्राम्हण संघटनेचेहि त्याने तीनतेरा केले आहेत. आंग्लाई जाऊन हिंदी संघराज्य स्थापन झाले आहे, तरीहि त्या घटनेला पुणेकर ब्राम्हणांचा जो कडवा विरोध आहे. त्याचेहि मूळ त्या अभिमानातच आहे. आज निदान लोकशाही, लोकसत्ता, याविषयी जनतेच्या कल्पना १८५७ साला इतक्या निराकार निर्गुण राहिलेल्या नाहीत. सत्तावनी वीराना सरंजामशाहीपेक्षा देशाच्या राजकीय मोक्षाची विशेष कल्पना काहीच नव्हती. महाराष्ट्रात तर पेशवाईच्या म्हणजेच ब्राम्हणी सत्तेच्या पुनर्घटनेशिवाय ब्राम्हण क्रांतिकारकांच्या मस्तकांत दुसरे वेडच नव्हते. आजहि ते नाहीसे झालेले नाही. किंचित स्पष्टच बोलायचे तर चालू घडीला हिंदुत्वनिष्ठेच्या मुखवट्याखाली चाललेल्या या लोकांच्या उघड गुप्त खटपटी ब्राम्हणी सत्तेच्या प्रस्थापनेसाठीच आहेत, ही दीर्घ सूचनेची मक्खी महाराष्ट्रातला तमाम बामणेतर वर्ग पुरेपूर ओळखून आहे. महात्मा गांधींच्या राजकारण प्रवेशापूर्वी हे लोक स्वताला ‘राष्ट्रीय’ म्हणवीत असत. यांचा पक्ष राष्ट्रीय सभा राष्ट्रीय पुढारी राष्ट्रीय, त्यांची व्याख्याने राष्ट्रीय, वर्तमानपत्रे कीर्तने ग्रंथ गणपतीचे मेळे सर्व काही राष्ट्रीयच राष्ट्रीय. आता नेमका तोच राष्ट्रीय शब्द शिवी म्हणून कांग्रेसी राजकारणाला वापरून ते आता हिंदुत्वनिष्ठ म्हणून मिरविण्यात धन्यता मानतात. स्वजातीच्या अभिमानावर लांबरुंद तणाव्याची विश्वबंधुत्वाची शालजोडी पांघरून इतरेजनाना भुरळविण्याच्या कामात या लोकांचा हात कोणीहि धरू शकणार नाही. सातारच्या राज्यक्रांतीच्या इतिहासात या वर्गाची दिसून येणारी पिण्डप्रकृति आज बदललेली आहे, असे छातीला हात लाऊन सांगण्या इतके धाडस करणे धाडसाचे आहे. यांच्या संप्रदायात अफाट बामणेतर बहुजन समाज कटाक्षाने भाग घेत नाही. हाच या सिद्धांताचा पुरावा नाही काय?
सत्तावनीचा एक अघोरी पायंडा
५७ च्या बण्डाळीने हिंदुस्थानात एका अघोरी उपक्रमाचा पायंडा घालून ठेवला आहे आणि तो परवाच्या १९४२ च्या दंगलीपर्यंत चालत आलेला आहे. आंग्रेज स्त्री पुरूष नि मुलांचे खून पाडणे आणि त्यांचे सरकारी खजिने लुटणे हा बंडवाल्यांचा राजरोस हेतू. पण त्याहिपेक्षा गांवोगांवी रयतेची लुटमार, जाळपोळ आणि कत्तली करण्याचे कर्म त्यानी फार मोठ्या प्रमाणावर केले. त्या बंडवाल्याना धाकात नि शिस्तीत ठेवील असा कोणी नेताच नव्हता. प्रत्येक शिपायी स्वतालाच एकांडा शिलेदार समजून वाटोवाट मन चाहील ते उत्पात करीत चालला होता. अंग्रेजाना सहकुटुंब सहपरिवार कण्ठस्नान घालण्याच्या हमरीतुमरीत त्या बंडखोर शिपायांच्या फलटणी खेड्यापाड्यातल्या रयतेला नागवून हैराण करण्यातच मर्दुमकीची शेखी मिरवीत सैरावैरा भडकवत होत्या. दरोडे घालून रयतेची लूटमार करणाऱ्यांना लोकसत्ताक राज्यस्थापनेच्या महत्वाकांक्षेचे सर्टिफिकीट देणाऱ्यांच्या लोकशाहीच्या व्याख्या काय असाव्या, हे तेव्हाच उमजण्यासारखे आहे. अर्थात गांजलेल्या रयतेने ‘‘अंग्रेजी सत्ता बरी. पण ही देशी शिपुरड्यांची नादीरशाही नको." अशा वाजवी निर्धाराने आंग्रजांचा जागोजाग पुरस्कार केला नि त्याना सर्वतोपरी मदत करून सत्तावनी बंडाच्या नांग्या ठेचवल्या, यति नवल करण्यासारखे काहीहि नाही.
विनायको प्रकुर्वाणाम् -
पेशवाईचा वाजवी नायनाट झाल्यानंतर देशोद्वाराच्या सबबीखाली राज्यक्रांति घडविण्यासाठी जे जे धाडसी ब्राम्हण पुढे आले, त्यानी शिवाजीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. गुप्त संघटना, शपथा, दीक्षा, कवायती वगैरे वासुदेव बळवंताने तेच केले आणि अभिनव भारताच्या तात्याराव सावरकरानीहि तेच केले. दोघानाहि ‘विनायको प्रकुर्वाणाम् रचयामास वानरम्’ असाच अनुभव आला. अभिनव भारत संस्थेने निदान दरोडे लूटमारीचा सत्तावनी कित्ता गिरवला नाही. पण वासुदेव बळवंताने मात्र आंग्रेजांवर हत्यार धरण्यापूर्वी स्वकीयांवर नि स्वजातीयांवर दरोडे घालून लूटमार केली. का? तर म्हणे, राज्यक्रांति करायची तर पैका पाहिजे. श्रीमंत स्वजन बऱ्या बोलाने तो देत नसतील, त्याना कार्याचे महत्व पटत नसेल, तर त्यांची घरेदारे लुटून, त्या थोर कार्यासाठी संपत्ति पैदा करायला काही हरकत नाही, काही पाप नाही. श्रीमंतांचे वाडे आणि देवळांतील संपत्ति दरोडे घालून लुटण्याचा हा उपक्रम परवाच्या जेजुरीच्या दरोडखोरांपर्यंत अविच्छिन्न चालत आलेला आहे. शिवाजीने स्वदेशातल्या जनतेच्या घरदारांवर दरोडे घातल्याचा पुरावा अजून तरी पुढे आलेला नाही. त्याने परकीय शत्रूच्या कल्याण खजिन्याची आणि गोऱ्या टोपकरांच्या सुरतेच्या वखारीची लूटमार केली. पण महाराष्ट्रातल्या रयतेच्या केसालाहि कधी त्याने धक्का लावला नाही. म्हणूनच सारी जनता त्याला परमेश्वर मानून त्याच्या हरएक कार्यासाठी जान कुर्बान करायला सजली. लोकोत्तर राष्ट्रवीरांच्या नुसत्या नकला करून, इतिहासाची पुनरावृत्ति घडविण्याचा अट्टहास करणारानी, कालौघाबरोबर मानवी जीवनाची नि कर्तव्याची मूल्येहि भराभर बदलत असतात, इकडे दुर्लक्ष करून चालत नाही. शिवाजीने धर्माच्या नांवाने हाक मारून हिंदूना स्वराज्यप्राप्तीसाठी चवताळून उठविले, आणि औरंगझीबाचा पाठकणा ठेचला. त्या काळाला ते ठीक झाले, आज कोणी त्याच मंत्राने हिंदू संघटन करण्याची फुशारकी मारील तर काही साधणार नाही. वर्तमान जीवनात धर्माला अफूच्या गोळीपेक्षा विशेष मूल्य किंवा महत्वच उरलेले नाही. शिवाजीच्या काही गोष्टींच्या नुसत्या नकला करणाराना त्याने आपला लोकसंग्रह केवढ्या सर्वस्पर्शी तत्वावर किती निःस्वार्थ बुद्धीने आणि जनतेचा विश्वास संपादून केला, याचे मर्म अझूनहि उमगलेले दिसत नाही.
विठोबाची शोभा पंढरपुरात
चालू घडीला राजेशाही. सरंजामशाही नि भांडवलशाही याविषयी आमच्या कल्पना, भावना नि तिटकारा काहिहि असला, तरी त्याच कल्पनांच्या चष्म्यातून शंभर वर्षांपूर्वीच्या पूर्वजांच्या आचार विचारांची बरी वाईट ठरवाठरव करणे, मूर्खपणाचे आहे. आंग्रेजांच्या गळ्याला मिठ्या मारण्याऐवजी राघोबादादा नाना फडणिसाला शरण कां गेला नाही? आंग्रेजलोक लुच्चे दगाबाज आहेत. हे प्रतापसिंहाला कळू नये काय? अलपिष्टनाशी कारवायी करण्याऐवजी रंगो बापूजी रावबाजीलाच प्रसन्न करून घेता तर? हे नि असले ऐदी प्रश्न उपस्थित करून, त्यावर स्वताच्या पांडित्याची पाचकळ परवड रचणारे शाहीर पढतमूर्खाशिवाय कोणत्या कोटीत ढकलायचे? राजेशाही आज आम्हाला अमान्य असली, किंवा सरंजामशाहीविषयी आज आमचा तिटकारा असला तरी धोंडोपंत नानासाहेब नि राणी लक्ष्मीबाई आणि त्यांचे शेकडावारी अनुयायी नि भक्त यांच्या राजेशाहीविषयी भावना अतिशय नाजूक, प्रामाणिक नि कट्टर जिव्हाळ्याच्या होत्या. तो त्यांच्या जगण्यामरण्याचा प्रश्न होता. त्याच्या टिकावासाठी त्यानी आपले प्राण पणाला लावले, आंग्रेजांसारख्या शिस्तबाज गनिमाशी कमाल शौर्याने लोकोत्तर पराक्रमाचे सामने दिले आणि इतिहासात आपले नांव अजरामर केले. आजच्या शहाण्यांचा राजकारणी शहाणपणा त्याना नव्हता, म्हणून काय आम्ही त्यांच्या राजेशाही महत्वाकांक्षेला कवडीमोल ठरवून त्यांच्या आत्मयज्ञाला हिणकस मानायचे?
स्वातंत्र्य समरवाले शाहीर नानासाहेबाला आकाशापेक्षा उंच उचलून धरतात. ती त्यांची नुसती शाहिरी आहे. आधी बंडवाल्यानी त्याला मारून मुटकून पुढारी बनवले. यावज्जन्मात ज्याने खाना पीना चम्मनमे रहेना, या ख्यालीखुशाली पलिकडे काही केलेच नव्हते, त्याने कानपूरला पराभवाचा पहिला दणका खाताच, बायकोला बरोबर घेऊन बिथूरहून पलायन केले, त्याची गोष्टच नको. पण राणी लक्ष्मीबाई आणि स्वामीनिष्ठ रणगाजी तात्या टोपे यांच्या पराक्रमाने मऱ्हाठ्यांचा इतिहास उज्वल केला. राणीने स्वताच्या नि तात्याने मालकाच्या सरंजामशाहीसाठी, आंग्रेजाना दे माय धरणी ठाय करणारे जे मर्दानी सामने दिले, ते तत्कालीन राजकारणी महत्वाकांक्षेच्या साध्यासुध्या चौकटीत जसे शोभून दिसतात, तसे ते आधुनिक लोकशाहीच्या भाडोत्री महिरापीत कोंबून बसविण्याचा यत्न आचरटपणाचा होय, पंढरपुरातच विठोबाची खरी शोभा. मुळा मुठेच्या संगमावर किंवा मुंबईच्या बँकबेवर त्याला ठेवल्यास कावळे घारी कबुतरे नि गिधाडे त्याची निष्कारण शोभा करणार!
आंग्रेजलोक प्रामाणिक सच्चे आहेत का दगाबाज लुच्चे आहेत, हे विद्यमान पुणेरी पंडिताना पटविण्यासाठी, त्यांच्या बापजाद्यांच्या तीन पिढ्या अनुभवांवर अनुभव घेण्यात खर्ची पडलेल्या आहेत हे त्यानी विसरू नये. आजचा या शहाण्यांचा राजकारणी शहाणपणा स्वयंभू नव्हे आणि सनातनहि नव्हे. निःशस्त्र राजकारणाच्या प्रभावाने कांग्रेसने ब्रिटिश सत्तेला ‘चले जाव` धमकी देऊन अखेर तिला भारतपार घालविली आणि हिंदी संघराज्याची स्थापना केली. १५ आगष्ट सन १९४७ रोजी हिंदुस्थान स्वतंत्र झाला. हजार हिकमति लढवून दोन युरपीय महायुद्धात ज्या आंग्रेज गब्रूंनी जर्मनीसारख्या कर्दनकाळ दैत्याला परस्पर पावणेतेरा धोरणाने, चारीमुंडे चीत लोळवला. ते आंग्रेज आपणहून सुखासुखी भारतीय सत्तेवर तुळशीपत्र ठेऊन निघून जातात. या अभूतपूर्व राजकारणी मुकाबल्यात कसल्या आंतर्राष्ट्रीय राजकारणी पेचापुढे ब्रिटिशानी हात टेकले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या दरबारात हिंदी संघराज्याचे विद्यमान सूत्रधार हिंदुस्थानाचे आंतर्राष्ट्रीय वजन प्रस्थापित करण्याचा अट्टहास का करताहेत आणि जातीयवादाला दडपून भेदातीत हिंदवी नागरिकत्वाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी महात्मा गांधी आपले प्राण पणाला का लावताहेत, याचेहि आंतर्राष्ट्रीय मर्म हिंदुत्वनिष्ठेच्या बढाया मारणाऱ्या ज्या बामण चाणक्याना आज उमगत नाही. त्यानीच १८५७ च्या वीर वीरांगनाना लोकसत्ताक स्वराज्याच्या महत्वाकांक्षेचे सर्टिफिकीट द्यावे. हा देखावा मोठा पहाण्यासारखा आहे.
एळकोट राही ना, मूळ स्वभाव जाई ना
देशभक्त कोण आणि देशद्रोही कोणाला ठरवायचे. या धंद्याची मनापली पेशव्यांच्या घाशीरामीपासून तो घालू घडीपर्यन्त पुण्याच्या शहाण्यानी स्वताकडे खास राखून ठेवलेली दिसते. इतिहासाच्या क्षेत्रात तर आपला तो बाब्या नि लोकाचा तो कारटा ही त्यांची वृत्ति कायम आहे. कमालीचे अल्पसंख्य असूनहि चां. का. प्रभूच या लोकाना आजवर पुरून उरलेले आहेत. मयत इतिहासाचार्य विश्वनाथपंत राजवाडे यानी तर सबंध कायस्थ प्रभू समाजाला `स्वराज्यबुडवे’ ठरविण्याचा मोठा परशुरामी प्रयत्न केला. स्वताच्या चित्पावन जातीची उत्पत्ति पुराणांतल्या पुराणांत छपवून ठेवून, कायस्थ प्रभूना त्यानी ‘नीच बीजाचे’ ठरविण्याचीहि नाना फडणिसी खटपट केली. या बदकर्माचे पुरेपूर प्रायश्चित भोगून राजवाडे निजधामाला गेले, तरी त्यांची परंपरा चालविणारे चित्पावन चाणक्य पुण्याच्या हवेत, अहीमहीच्या रक्तबिंदूप्रमाणे, अखंड पैदा होत असतात. रंगो बापूजीने ईस्ट इंडिया कंपनीची नोकरी केली म्हणून त्याला `देशद्रोही’ ठरवायला पुण्याचा एक शाहिरभट सरसावला आहे. रंगो बापूजीला `देशभक्त` म्हटलेलेहि या शहाण्याला खपत नाही. आंग्रेजांची नोकरी हे त्याला महत्पाप, अगदी नरकाचे साधन वाटते. बापकमाईवर फुकटाफाकट मानमान्यतेत जगणाऱ्या या जिवाणूला आंग्रेजांची किंवा एकाद्या धेडाची नोकरी करण्याचा प्रसंग आलेला नसला, तरी अंग्रेजांच्या नोकऱ्या करूनच चित्पावन समाजातील हजारो मंडळीनी आपापले भाग्योदय घेतलेले आहेत, याचे पुरावे शनिवार नारायण नि सदाशिव पेठांतील हवा तो वाडा खास देऊ शकेल. चित्पावनांचा आंग्लद्वेष मतलबी असे. आंग्रेजाना डोक्यावर नाचवूनच ना त्यानी प्रतापसिंह छत्रपतीला अखेर खड्यात घातला? त्या जुन्या गोष्टी ठेवल्या बाजूला, तरी बामणेतर चळवळीच्या हंगामात, शाहू छत्रपति, सत्यशोधक चळवळ आणि जेथे जवळकरांच्या छत्रपति मेळ्याला ठेचण्यासाठी, पुण्यासाताऱ्याच्या बामणानी आंग्रेजी बुटांशी किती लगटीची चुंबाचुंबी केली, याचे २०-२५ वर्षांपूर्वीचे दाखले जिवंत आहेत. एकंदरीत सारांश एवढाच निघतो की पेशवाई गेली तरी तिची भुताटकी पुण्यात अझून शिल्लक आहे. आम्ही सांगू तोच खरा इतिहास, ठरवू तोच प्राणी देशभक्त, बाकीचे सारे देशद्रोही आम्ही लिहू बोलू तीच मराठी भाषा, आमचेच पंचांग लोकमान्य, स्वदेशाभिमान काय तो आम्हाला ठावा. आम्हीच तो गाया नि इतराना सांगावा. बामणेतर कधीच गेले नाहीत त्या गांवा, असा जो कांगावा या दामिक हिंदुत्वनिष्ठाच्या राष्ट्रीय ठणठणाटात तडाखेबंद ऐकू येतो, त्यात सत्याभिमान, इतिहासभक्ति, साहित्यसेवा, हिंदूचा उद्धार, लोकशाहीची विवंचना वगैरे काहीहि नसून, मयत पेशवाईच्या-ब्राम्हणी वर्चस्वाच्या पुनरुद्धाराचा दुर्दम्य अट्टहास मात्र दिसून येतो. त्या धोरणानेच इतरांच्या इतिहासाची, त्यांच्या वीर वीरांगनांची आणि स्वदेशभक्तांची निंदा नालस्ती करण्याचा त्यांचा क्रम अखंड चालू असतो. स्वजातियांशिवाय इतरांत चांगले असे काही पूर्वी त्याना दिसले नाही, आज दिसत नाही, पुणेरी भटभिक्षुकानी चालविलेली वृत्तपत्रे मासिके तेवढी सार्वजनीक इतरांची तेवढी हमखास जातीय ठरविण्याचा त्यांचा खाक्या विष्णुशास्त्री चिपळोणकरापासून चालू आहे.
सन १८१८ साली पेशवे आपल्या बदकर्मानी ब्रम्हावर्ताला परागंदा झाले आणि मागे सातारचे मराठा छत्रपति तेवढे टिकले, याचे पुण्याच्या चित्पावनाना एवढे भयंकर वैषम्य वाटले, त्यांचा क्रोधानळ इतका बेफाम भडकला आणि संतापाने त्यांची माथी अशी कडाडून भणाणली का तक्तासकट छत्रपतीचा नायनाट झालेला पाहूनहि तो क्रोधानळ शमला नाही. त्याचा वणवा अझूनहि त्यांच्या हृदयांत सारखा धुमसत असतो. अशा दग्ध मनोवृत्तीच्या लोकाना सरदार गोपाळराव हरि देशमुख लोकहितवादी (त्याचेच जातभाई) या द्रष्टया निस्पृह स्पष्टवक्त्याची बोधवाणी रुचली नाही, तर रंगो बापूजीच्या लंडन येथल्या १४ वर्षांच्या आंतर्राष्ट्रीय चळवळीचा ५७ च्या ब्रिटीश राज्य सत्तांतरावर किती कसा नि काय परिणाम झाला. हे विचारात घेण्याइतका विवेक शिल्लक असेलच कसा?
प्रतिस्पर्ध्याविषयी घाणेरड्या कुचाक्या फैलावून त्याला बदनाम करण्याची चित्पावन मुत्सद्यांची परंपरा बारभाईपासून आजवर अखंड चाललेली आहे. या कामात ते आंग्रेजांचे समगोत्री म्हटले तरी चालेल. आज स्थापन झालेल्या हिंदी संघराज्याच्या कारभारात पेशवे सांप्रदायिकाना ‘पक्का काट’ मिळालेला आहे आणि देशाच्या राजकारणातहि त्याना कोणी कोठे विचारीत नाहीत. दिल्लीच्या हिंदुमहासभावाल्याना नि राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाल्याना चिथावून नेहरू सरकार उलथून पाडण्याच्या अपयशी कटाने या बहिष्काराचा वचपा काढण्याचा उपव्याप थोड्याच दिवसांपूर्वी जनजाहीर झालेला आहेच. जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई आणि त्यांच्या प्रत्येक राजकारणी हालचालीची निरर्गल शब्दांत निंदा त्यांच्या पुणेरी पत्रात दररोज चालू असते. महात्मा गांधींची सर्वच्यासर्व मते सर्वांनाच पटतात असे नाही. पण ते एक राजकारणी पुरुषोत्तम अहित, जगदवंद्य महान् साधू आहेत, याची साक्ष पंचखण्ड दुनिया देत असतानाहि, पेशवाई पिण्डाचा हरएक असामी आणि त्यांची वृत्तपत्रे महात्मा गांधीना आचकट विचकट शिव्या देऊन आपल्या पिढीजात खुनसटपणाचे प्रदर्शन कसे करीत असतात, हे पाहिले म्हणजे रंगो बापूजीला त्यानी ‘देशद्रोही’ ठरवले प्रतापसिंहाला ‘नादान’ म्हटले, शाहू छत्रपतीना ‘स्वराज्यद्रोही’ शिवी हासडली. बळवंतराव मल्हार चिटणिसाला `लांचखाऊ भाडखाऊ’ म्हटले आणि तमाम कायस्थ प्रभू जमातीला ‘स्वराज्यबुडवे’ जाहीर करण्याचा खटाटोप केला. तर समंजस जनता यावरून काय बोध घ्यायचा तो घेतच असते.
पेशवाईने महाराष्ट्राला कीड लावली
पेशवाईच्या उत्तरार्धात, राज्यसत्तेच्या पाठबळावर ब्राम्हण लोक फार उन्मत्त झाले. तसेच ते भयंकर अनाचारीहि बनले. असे एकहि घाणेरडे व्यसन शिलकी उरले नाही का ज्यात भिक्षुक, शास्त्री, गृहस्थ, सरदार नि श्रीमंत पेशवे यानी कहर केला नव्हता. राज्यसत्ता हाती आल्यामुळे हिंदु समाजाच्या ऐहिक पारलौकीक मोलाचे कर्मसिद्ध कोठावळे नि दण्डधारी म्हणून मिरवणाऱ्या ब्राम्हण वर्गाची बदफैली नि व्यसनासक्ति पाहून इतर समाजांतही त्या व्यसनांचा फैलावा झाला असल्यास नवल ते काय? सत्ताधाऱ्यांच्या गुणांपेक्षा त्यांच्या व्यक्त अवगुणांची नक्कल लोक नेहमीच करतात. सारा महाराष्ट्र नामर्दाईने नि निर्लज्जतेने आरपार सडून गेला. पेशवाई बुडाली, हा काही मोठा चमत्कार किंवा अपघात झाला नाही. तसे झाले नसते तरच ते एक मोठे आश्चर्य होते. "पुण्याची हीं बामणे आपण तर बुडताहेत. पण आपल्याबरोबर आम्हालाही खड्यात घालताहेत." हा चतुरसिंग भोसल्याचा अभिप्राय वाजवी होता. लोकहितवादी म्हणतात (शतपत्रे पान ७५) ‘‘बाजीरावचे कर्म चांगले नव्हते. नट व भये मात्र त्याची स्तुति करीत. दुसरे सर्व त्यास कंटाळून राहिले होते व प्रजास सर्व वश होते. तेव्हा इंग्रजानी मुलूख घेतला." (रावबाजीच्या एळकोटाचे पाप चित्पावन संशोधक मात्र प्रतासिंह, बळवंतराव चिटणीस नि रंगो बापूजीच्या माथी मारतात!) ब्राम्हणांचे सारे वर्चस्व पेशवाईच्या डोल्हाऱ्यावर डगमगते होते. तो डोल्हाराच कोसळून जमीनदोस्त होताच, सगळा चित्पावन समाज उघडा पडला. त्यांची राजकारणी नालायकी, सामाजिक गुण्डगिरी, धार्मिक वर्चस्वाची मिजास आणि नैतिक भ्रष्टाचार, सारे दोष चव्हाट्यावर आले. इतरेजनांच्या विश्वासाला नि सहानुभूतीला तो आधीच पुरा पारखा झालेला असल्यामुळे, महाराष्ट्रात को. प्रा. म्हणजे सगळ्यांच्या उघड तिटकाऱ्याची वस्तू बनली. त्यांचे सर्व क्षेत्रांतील पुढारपण जे एकदा नष्ट झाले ते आजवर कायम! शनिवार वाड्यावर आंग्रेजांचा बावटा नातूने फडकावला, त्या दिवशी सर्व पुणे शहरात आब्राम्हण पुणेकरानी पेढे वाटून उत्सव केले. पेशवाई गेली- एक महामारी गेली, असे जो तो म्हणू लागला. पेशवाईमुळेच ज्यांच्या पोटापाण्याला चबचबीत वंगण मिळत होते, असे काही थोडे वाण्डगुळचे रडले. पण त्यांतले बरेचसे श्रीमंताबरोबर ब्रम्हावर्ताच्या यात्रेला निघून गेले, ते तिकडेच कायमचे परागंदा झाले. रावबाजीबद्दल ब्राम्हणाना वाटे -
"तो मोठा ब्राम्हण प्रभू! केवढा दानशूर! केवढा पट्टीचा विद्वान ब्राम्हण! ...ब्राम्हणांचा तर केवढा अन्नदाता! पंक्तीत स्वता आग्रह किती म्हणून करायचा? गेले बिचारे ब्राम्हणाचे राज्य."
तर त्यांच्याच घरांतल्या बायका म्हणत ‘‘बाजीरावचे आता पुण्यास राज्य नाही. बरे झाले. चांगले मेल्याचे तळपट झाले, मोठा चांडाळ होता तो. वाईत आला तर ५०० बायकांनी विहिरींत जीव दिला." असला प्रताप एकट्या रावबाजीचाच नव्हता. त्यांचे बंधु अमृतराव याने पुणे लुटले, तेव्हा काय पराक्रम केला, तो पहा. "लोकांस राखेचे तोबरे दिले. कानात आणि बेंबीत दारू घालून उडविली. धुऱ्या दिल्या. तक्त्यांत माणसे पिळली. तवे तापवून त्यावर उभी केली. तेल कढवून पोरांच्या देखिल अंगावर शिंपले" (शतपत्रे न. ७५) हे सारे कशासाठी? तर पैका उकळण्यासाठी! सारांश, पेशवाईबद्दल चित्पावनाना अमर्याद अभिमान वाटणे साहजीक नि पिण्डप्राप्त असले, तरी त्या राज्यसत्तेविषयी चित्पावनेतर आब्राम्हणशूद्र मऱ्हाठ्यांच्या मनात रुजलेला नि वाजलेला तिटकारा पहिल्या इतकाच अझून तीव्र आहे. म्हणूनच हे समाज या वर्गाच्या कोणत्याहि लटपटी खटपटीच्या व्यापापासून शंभर योजने दूर रहाण्याची खबरदारी घेत असतात. जनतेच्या विश्वासाला सफाई मुकलेल्या या जातीतल्या क्रांतिकारकानी राज्यक्रांतीचे जे जे एकांडी शिलेदारी उठाव केले, ते लेकसत्तेच्या प्रस्थापनेसाठी का आणखी कशासाठी, याचे गूढ ब्रम्ह नि मायेच्या वादा इतके काही गूढ राहिलेले नाही.
महाराष्ट्राचे द्रष्टे लेकहितवादी
आंग्रेजी झाली तेव्हा तिचा कोणीच प्रतिकार केला नाही. सर्वत्र तिचे स्वागतच झाले. पुढे संस्थानिकांची संस्थाने आणि सरदारांची वतने गिळंकृत करण्याचा आंग्रेजानी जेव्हा गिधाडी उपक्रम चालू केला. तेव्हा लोक थोडधोडे डोकी खाजवू लागले. पाश्चात्यांच्या लोकशाही राज्यतंत्राची बिनचूक स्पष्ट कल्पना असणारा, रंगो बापूजीचा समकालीन, असा एकच स्पष्टवक्ता नि द्रष्टा मऱ्हाठा महाराष्ट्रात होता. तो म्हणजे सरदार गोपाळराव हरि देशमुख, ऊर्फ लोकहितवादी. सन १८४० ते १८५२ च्या दरम्यान लंडनात बसून ब्रिटिश लोकराज्याचे प्रत्यक्ष अनुभवाचे पडताळे नि पाहिलेले देखावे रंगो बापूजी हिंदुस्थानातल्या मित्राना पत्रांच्या परवडीने सारखा कळदीत असतानाच, लोकहितवादी नेमके तेच नि तसलेच विचार आपल्या शतपत्रांच्या लेखमालेने मुंबईच्या ‘प्रभाकर’ साप्ताहिकातून सतत दोन वर्षे (सन १८४८ ते १८५०) अखंड कटाक्षाने प्रगट करीत होते. भिक्षुक, शास्त्री पंडित, गृहस्थ, सरदारादि मंडळींची दिनचर्या कशी किती नि का बहकलेली आहे. आणि हिंदू समाजांत त्यांची जागोजाग कशी नाचक्की चाललेली आहे. याची प्रत्यक्ष पानी पाहिलेली शेकडो चित्रे लोकहितवादीनी आपल्य शतपत्रांत मुद्रित करून ठेवलेली आहेत.
(लोकहितवादींची शतपत्रे श्री. श्रीपाद रामचंद्र टिकेकर यानी मार्मिक पद्धतीने संपादन (एडिट) करून उषा प्रकाशन, औंध (जि. सातारा) या संस्थेकडून प्रकाशित केलेली आहेत. किंमत रुपये चार. अगत्य अभ्यासावी. एकाच पारायणात जातीयवादाचा ताप उतरेल.)
"भागवताची हजार पारायणे केली व रामायण नित्य वाचले, तरी हिंदुस्थानांत इंग्रज कसे आले. हे समजणार नाही... जे गुण राज्यकर्त्यांमध्ये असावे ते हिंदू लोकांमध्ये नाहीत, राज्याची पद्धति त्यांस ठावूक नाही. आजपर्यन्त ब्राम्हण लोकांनी राज्य कधि केले नाही. हा एवढाच शंभर वर्षे पेशवाईत काय तो दिवा लागला! ...ब्राम्हणलोक स्वहिततत्पर, गर्विष्ठ व कृत्रिमी आहेत. कितीहि काळ जरी ब्राम्हणी राज्य चालते तरी सतिबंदी होती ना, पेण्ढार मोडते ना व बालहत्या बुडती ना... पुणे द्रव्याने हलके खरे, परंतु दुष्कर्मात तेथील लोक द्रव्यवान शहरांपेक्षा अधिक आहेत व बहुत लोक आपले सामर्थ्याची पराकाष्टा करून रांडांचे ताफे बाळगण्याचा खर्च जिवादारभ्य करितात" पेशवाई वर्चस्वामुळे चित्पावनांची राजकारणी, सामाजिक नि धार्मिक वस्तुस्थिति किती नालायकीची झालेली होती, आणखी याचे चित्र काढताना, लोकहितवादी म्हणतात, ‘‘ब्राम्हण लोकांची नीति बुडाली. बाजीराव राज्यावर होता तेव्हा जे त्याचे अंकित होते, त्यांच्या स्त्रिया त्याने भ्रष्ट करून नाना प्रकारची कुनीति केली. परंतु त्यास प्रतिकार कोणाच्याने करवला नाही. पुण्यास शास्त्री व पंडित त्या वेळेस बहुत होते, परंतु साखरभात खाऊन ‘वाहवा’ म्हणत गेले. याप्रमाणे त्या मूर्ख, चांडाळ, दुष्ट व अतिशूद्राहूनहि नीच प्रभूस राज्यावर मटांनी व गृहस्थानी रक्षण केला. त्याचे परिणाम आज सर्वास, त्यांतून बहुधा ब्राम्हणांस प्राप्त झाले आहेत.’’ (श. प. पान २६५).
इतकी हल्लाकी झाली होती तरीहि ब्राम्हणांची इतर समाजांवरची गुरकी कमी झाली नव्हती. ते सारे तोंडावर त्याना शिव्या हासडायचे. ‘‘साहेबांचे राज्य चांगले. साहेब न्याय इनसाफ चांगला करतो. पण ब्राम्हण लोक त्यांस शिकवून आमची घरे बुडवितात. हे हलकट लोक फार प्रळय करतात आणि त्यांस आशा फार म्हणून जोंवर नेटिव लोक दुर्गुणीं व लोभी आहेत. तोपर्यन्त त्यांचा पक्षपात कोणी धरावा?"
असा एका कुणबी इसमाचा अभिप्राय लोकहितवादींच्या शतपत्रांत छापलेला आहे.
आंग्लाई सत्तेने देशी लोकाचा सर्वच क्षेत्रांतला वरचष्मा नष्ट झाल्यामुळे, आंग्रेजांकडे ते किंचित रोषाने पाहू लागले. त्यांत संस्थानीक, सरदार, जहागीरदार, वतनदार हे प्रमुख होते. आंग्रेजी राज्यव्यवस्थेत सब घोडे बारा टक्के मामला चालू झाल्यामुळे, या सरंजामदाराना नि त्यांच्या शिलकी नकली ऐश्वर्यावर ऐतोबासारखे जगणाऱ्या लोकांना वाईट वाटणे साहजीक होते. या रोषाचा पारा ‘आंग्रेजी जावी’ एवढ्या बिंदूवर चढला. तरी आंग्रेजी गेल्यावर किंवा काही तरी खटपट करून घालविल्यावर पुढे काय? याची मात्र एकालाहि काही निश्चिती देववे ना. एकट्या चित्पावन ब्रहस्पतीना मात्र वाटे का आंग्रेजांना हुसकावून श्रीमंतांच्या पेशवाईची पुनर्घटना झाली. का महाराष्ट्राचेच काय पण उभ्या हिंदुस्थानाचेहि भाग्य उदयास येईल पण बहुजन समाज या त्यांच्या शहाणपणावर विश्वास ठेण्याइतका गाफील नव्हता. हिंदुस्थानाबाहेरच्या देशांतली गोष्टच सोडून द्या. महाराष्ट्राबाहेर कार्य अवस्था होती, याचीहि ज्या दाक्षिणात्य शहाण्याना कल्पना नाही. त्यांच्या ब्राम्हणी सत्तेच्या पुनरुत्थानावर महाराष्ट्राच्या मोक्षाचे त्यानी अडकविलेले मडके किती कच्च्या मातीचे होते. याची लोकाना चांगलीच अटकळ होती. संस्थानी किंवा सरंजामदारी राज्यपद्धतीने महाराष्ट्राचेच काय, पण सबंध हिंदुस्थान देशाचे या पुढे काहीहि कल्याण होणारे नाही: जातीय महत्वाकांक्षने उभारलेल्या कोणत्याहि प्रतिकाराने आंग्रेजी सत्ता उलथून पडणार नाही जनतेला साक्षर करून त्यांच्या एकजुटीच्या बळावर आंग्रेजी लोकशाही पद्धतीचे सरकार देशात चालू करण्यासाठीच सर्वांनी यापुढे झगडले पाहिजे आणि त्यासाठी आंग्रेजी विद्या आत्मसात् करून कालवशात त्यांच्या विद्येनेच त्याना जिंकून हद्दपार हाकलता येईल. एरवी कशानेहि नव्हे या मुद्यांवर लोकहितवादींनी आपल्या देशबांधवाना शतपत्रांतून शेकडो कळकळीचे इषारे दिले. ते चालू घडीलाहि मुद्दाम अभ्यास करण्यासारखेच आहेत. "विलायतेत लोकसत्ताक राज्य आहे व इतर दुसरे टोपकर लोकांचे मुलुखांत तशाच प्रकारची राज्ये आहेत." तीच पद्धत आपल्याकडे चालू व्हावी, अशी खटपट करण्यासाठी लंडनला पार्लमेण्टकडे शिष्टमण्डळे पाठवावी, अशी लोकहितवादी सूचना करीत होते. "तसले राज्य येथे आले व जर त्यांत ब्राम्हण लोकांचा हात शिरला, तर लागलीच लक्षभोजने व कोटी होम मात्र चालू होतील." असा इषारा द्यायला ते विसरले नाहीत. आंग्लाईला नुसत्या शिव्याश्राप देण्यापेक्षा, शिवाजीच्या उपक्रमांची नुसती नाटकी नक्कल करणाऱ्या कटांनी त्याना उधळून लावण्याची पोरकट होड घेण्यापेक्षा, इंग्रेज कोण कोठचे? त्यांचा नि आमचा संघर्षच मुळी आला का? त्यानी बोल बोलता मऱ्हाठेशाहीचा नि पेशवाईचा चट्टामट्टा केला. त्याला आमचे कोणते दोष कोणती व्यसने, कसले अहंकार नि राजकारणी गुन्हे मदतगार झाले? फिरंगी बोका आपल्या घरात घुसू नये, घुसला. आता त्याला बाहेर काढण्यासाठी आमच्या राजकारणी अकलेची नि सार्वजनिक नीतीची जुनी हत्यारे कुचकामी आहेत. त्यांची राजनीति काय? राज्यशासन पद्धति काय? कंपनीच्या सनदेचे अधिकार किती? तिच्यावर ब्रिटिश पार्लमेण्टाची सत्ता किती? इत्यादि अनेक मुद्यांचा नीट कसोशीने अभ्यास करा. जुने अहंकार टाका. स्वता विद्यावान होऊन, इंग्रजी भाषेच्या अभ्यासाने जगातल्या राजकारणी आचार-विचार-क्रांतीचा कानोसा घ्या, पांढरपेशेपणाच्या कोरड्या मिजासीने फुगून न जाता. बहुजन समाजाना जवळ करा, त्यांचा विश्वास संपादन करा, विलायतेला शिष्टमण्डळे पाठवून विकटोरिया महाराणीकडे लोकसत्ताक राज्यपद्धतीची एकजुटीची मागणी करा, म्हणजे कंपनी सरकारच्या उच्छृंखलपणाला पायबंद लागेल. लोकमताला मान देणारी नवी राज्यव्यवस्था सगळीकडे चालू होईल, असे लोकाना पढविण्याचा लोकहितवादी तळमळीने प्रयत्न करीत होते. पार्लमेण्टरी धर्तीची राज्यव्यवस्था मिळाली तर तेथे जातीयवादाला बिलकूल थारा मिळता कामा नये, असे सांगताना लोकहितवादींनी इषारा दिला की जें फार विद्वान व चांगले चालीचे लोक आहेत, तेच नेमले पाहिजेत. मग त्यांची कोणतीहि जात असो. परंतु ब्राम्हणांचा गर्विष्ठपणा फार आहे. याजकरितां ती जात फार थोडी असली पाहिजे."
चालू घडीलाहि हा इषारा दृष्टीआड करण्यासारखा आहे का?
शुद्ध लोकशाही राज्यव्यवस्थेच्या आंग्रेजी तालिमीने आपले "लोक प्रबळ झाले. म्हणजे इंग्रजांस काही दिवसपर्यंत आभारी मानतील. कारण की त्यांचे योगाने हे ज्ञानी झाले. परन्तु ज्या काळी इंग्रज गडबड करू लागतील किंवा काही नवीन कानून बसवावयाचा आग्रह करतील, त्या काळी अमेरिकेत झाले तसे होऊन, हे लोक (हिंदी) आपल्यास स्वतंत्र करून घेतील आणि इंग्रजांस सांगतील कीं, तुम्ही आपले देशास जावे. आता आमचे देशाचा कारभार आम्हास चांगला करता येतो. तुमचे गुरुत्व नको. तुम्ही पाहिजे तर व्यापारापुरते इकडे येत जा. आमचे प्रजेचे जसे आम्ही रक्षण करितो. तद्वत् तुमचेहि करू. परंतु तुमचे वर्चस्व नको." सन १९४२ साली महात्मा गांधीनी ब्रिटिशाना ‘चले जाव’ची धमकी दिली. त्या विचाराचे मूळ ता. ८ फेब्रुवारी सन १८४९च्या लोकहितवादींच्या ४६ नंबरच्या पत्रात आढळते. यावरून सरदार गोपाळराव हरि देशमुख, लोकहितवादी, हे महाराष्ट्राचेच काय, पण भरतखंडाचे पहिले राजकारणी द्रष्टे मुत्सद्दी ठरतात. पण त्यांच्या विचाराना पुण्यातल्या पेशवाईधुंद भटानी कस्पटासारखे लेखून त्यांची मनस्वी निंदा टवाळी केली. त्याना ‘इंग्रेज-धार्जिणे’ म्हणून हिणवले. ‘मराठी भाषेचा शिवाजी’ म्हणून स्वयंभू पदवी धारण करणान्या निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळोणकरानी या द्रष्टया महात्म्याची निरर्गल टिंगल करून, पेशवाई सांप्रदायिकांच्या पक्षाचा पुरस्कार केला. मागासलेल्या बहुजन समाजाच्या कोंडलेल्या दडपलेल्या विचारांची कोंडी पिटाईने फोडून ब्राम्हणांचे कसब ब्राम्हणांचे कसब चव्हाट्यावर मांडणान्या ज्योतीराव फुल्यांची नि त्यांच्या सत्यशोधक समाजाचीहि या शास्त्रीबोवानी बामणी पांडित्याच्या जोरावर हुर्रेवडी केली. अखेर काळाच्या कचक्यात ते शास्त्रीबुवा नि त्यांची निबंधमाला मटामिनुकांच्या दप्तरांत आणि वाचनालयांच्या कपाटांत धूळ खात पडलेली असून, लोकहितवादी आणि ज्योतीराव फुले यांच्या तत्त्वांचा नि मतांचा हिंदुस्थानभर जयजयकार झालेला आहे.
लोकशाही जागृति काल परवाची
आमच्या देशात आंग्रेज नको, हा सत्तावनी क्रांतीचा विचार एकसारखा वाढत्या प्रमाणावर बळावत असला, तरी १८८५ साली जन्माला आलेल्या इंडियन नॅशनल कांग्रेसलाहि लोकसत्ताक निर्भेळ स्वराज्याची जाणीव नव्हती. कायदेशीर मार्गाने ब्रिटिश साम्राज्यांतर्गत वसाहतीच्या स्वराज्यापुरत्याच तिच्या खटपटी असत. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करताच वंगभंगाचा जो प्रचण्ड स्फोट झाला. त्याच वेळी राष्ट्रीय भावनेचा हिंदुस्थानांत उगम झाला. डॉ. अॅनी बेझण्टबाईनी होमरूलची चळवळ चालू केली आणि हिंदु-मुसलमान-ऐक्याचे तांबडे हिरवे निशाण देशाला दिले. अलिकडच्या काळातील हिंदुस्थानाचे हेच पहिले राष्ट्रीय निशाण या निशाणावरहि पुण्याच्या टिळक पक्षाने आक्षेप घेतला आणि त्यात एका कोपऱ्यात आंग्रेजांचा युनियन जॅक बावटा रंगवून, आपल्या पक्षाचे वैशिष्ठ्य जाहीर केले. होमरूल चळवळीपासून राष्ट्रीय भावनेला आणि स्वराज्याच्या प्रश्नाला जोर चढला. तरीहि कांग्रेस म्हणजे शहरी शाहाण्याच्या पोषाखी चळवळीचे केंद्र म्हणूनच राहिली. हा काळ पावेतों महाराष्ट्रातल्या क्रांतिकारकांच्या खटपटी केवळ पांढरपेशा मूठभर अनुयायांच्या संघटनेवरच उभारलेल्या होत्या. खेड्यापाड्यांतल्या बहुजनसमाजाच्या पाठिंब्याची कोणालाहि दाद नव्हती. काही पर्वाच नव्हती. वासुदेव बळवंताचा दीक्षाविधि घेणारे अनुयायी काय, अथवा सावरकरांच्या अभिनव भारताचे दीक्षित काय, एकजात सारे ब्राम्हणच होते. खरा हिंदुस्थान शहरात नसून, खेड्यापाड्यांत आहे. तो शेतकरी कामकऱ्यांचा कोट्यवधि बहुजन समाज उठविल्याशिवाय, या शहरी शहाण्यांच्या पोषाखी चळवळी फुकट आहेत. हे बिनचूक हेरून, कांग्रेसला अस्सल लोकशाही शक्ति बनविण्याची कामगिरी महात्मा गांधीनी बजावलेली आहे. गांधींच्या नेतृत्वाखाली कांग्रेस ही लोकशाही स्वराज्यप्राप्तीची जबरदस्त शक्ति कशी बनली, हा इतिहास तुमच्या आमच्या डोळ्यांपुढे घडलेला असल्यामुळे, तो येथे सांगण्याची आवश्यकता नाही. जातपात, धर्म, स्पृश्यास्पृश्य यच्चावत साऱ्या भेदांना महात्मा गांधींच्या काँग्रेसने सफाचाट तिलांजली देवून, खऱ्याखऱ्या लोकशाही सामर्थ्यावर हिंदीसंघराज्याचे स्वप्न आज सिद्ध करून दाखविल्यामुळे, पेशवाई राज्याच्या पुनर्घटनेने हिंदुस्थानाला आबाद करण्यास सजलेल्या जातीयवादी संघाना चालू घडीच्या राजकारणात द्वारपाळाचीहि जागा नाही.
सुभाषबाबूंच्या अपयशाने भारत स्वतंत्र झाला
काँग्रेसने प्रदीप्त केलेल्या लोकशाही यज्ञातील ठिणगी घेवून, आंतर्राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या नि पुरस्काराच्या जोरावर, नेताजी सुभाषचंद्र बोस यानी ब्रम्हदेशात निर्माण केलेल्या आझाद हिंद सैन्याचा रोमांचकारी इतिहास आज तमाम बालतरुण हिंदी जनतेच्या जिवंत स्फूर्तीचा स्फुल्लिंग होवून बसला आहे. शून्यातून ब्रम्हांड निर्माण करावे, विश्वमित्राने प्रत्यक्ष परमेश्वराला आव्हान देवून प्रतिसृष्टी निर्माण करावी, तद्वतच नेताजीनी आझाद हिंद सेनेचा प्रचण्ड उपक्रम करून, अस्सल एकराष्ट्रियत्वाच्या हिंदवी सैन्यसंघटनेने, जपान जर्मनीसारख्या उन्मत्त रावणांच्या कल्पनानाहि थक्क करून सोडले. १८५७ सालाचा उठाव आणि आझाद हिंद सैन्याचा उठाव यात जमीन आस्मानाचा फरक आहे. सत्तावनीत वैयक्तिक स्वार्थ, सरंजामशाहीचा अहंकार, जातीय महत्वाकांक्षा, धर्मभेद इत्यादि भानगडी तर होत्याच, पण लष्करी आक्रमणाला अवश्य लागणाला एकसूत्री शिस्तीचा सूत्रधार तेवढा नेमकाच कोठे कोणी नव्हता. शिवाय राष्ट्रीय भावना ही चीजच त्या वेळी जन्माला आलेली नव्हती आणि लोकशाही नि लोकसत्ताक राज्याच्या कल्पनांची कोणाला दादहि नव्हती. इम्फालच्या सरहद्दीवर ब्रिटिशांच्या सेनासागराला दे माय धरणी ठाय करून, विद्युल्लतेच्या कडकडाटाप्रमाणे थोडा काळ चमकून लुप्त झालेल्या आझाद फौजेच्या पराभवाला काहीहि करणे असली, तरी सुभाषबाबूंच्या `चलो दिल्ली` गर्जनेनेच अखेर काँग्रेसने दिल्लीच्या लाल दरवाजावर अशोक चक्रांकित तिरंगी झेंडा फडकावून, हिंदी संघराज्याची प्राणप्रतिष्ठा केली. हा लोकसत्ताक राज्यक्रांतीचा सौभाग्यसोहाळा पहाणारे आपण सर्व भारतवासी मोठ्या भाग्याचे आहोत.
रंगो बापूजीचा लोकशाहीचा अनुभव
आता रंगो बापूजीकडे पहा. लोकमतानुवर्ति ब्रिटीश राजवटीचा अभ्यास करीत नि प्रत्यक्ष अनुभव घेत लंडनात तो तब्बल चवदा वर्षे ठाण मांडून बसला होता. तेथल्या लोकमताच्या जोरावर प्रधान मण्डळे कशी घडत होती, गडबडत होती आणि गडगडतहि होती; चार्टिस्ट लोकांच्या लंडन प्रधान लॉर्ड रसेल याचे आसन कसे डळमळले होते आणि पार्लमेण्टाच्या निवडणुकीत ब्रिटीश जनता आपला मताधिकार गाजविताना मोठमोठ्या पुढाऱ्याना कशी वंगवीत होती. याचे अनेक मनोरंजक मासले तो प्रतापसिंहाला वरचेवर लिहून धाडीत होता आणि पुराव्यासाठी वर्तमानपत्रांची कात्रणेहि पुरवीत होता, प्रजेच्या विरोधाला घाबरून लंडनला पळून येऊन बसलेले फ्रान्सचे नि प्रशियाचे राजे त्याने डोळ्यानी पाहिले होते. ब्रिटिश जनतेच्या लोकशाही जोराविषयी तो लिहितो -
ज्याचे मनास येईल ते सवाल मेंबर होणारास करतात. रागास येतात. सिव्या देतात. तू खराब काम केले. तुला वोट देत नाही म्हणतात. आसा रयतेचा जोर की ज्यास कबूल करितील तो मेंबर होतो. ज्यास बडतर्फ करतील तो जातो. असा प्रकार या पार्लमेंटचे मेंबराचा आहे. आसी येकदिली व रयतेची कुदरत, सबब याचे राज्याची बढती आहे.
व्होटांच्या निवडणुकीचे तंत्र हिंदुस्थानात मुनसिपालट्या चालू झाल्या तेव्हा लॉर्ड रिपनच्या कारकीर्दीत (सन १८८० ते १८८४) हिंदी लोकांच्या प्रथम परिचयाचे झाले. तेव्हा त्या व्होटविधीचे महत्व आमच्या लोकाना मुळीच काही समजले नाही. ‘सरकारी हुकमाची एक कवायत’ यापेक्षा असूनही तालूके नि पेट्यांच्या मुनसिपालट्यांच्या निवडणुकीत त्याचे महत्व लोकाना विशेषसे पटलेले दिसत नाही. कौन्सिल असेम्बल्यांच्या निवडणुकांत तर चक्क जातीय किंवा पंथीय भावनांचे प्राबल्यच आज स्पष्ट दिसते, लोकशाहीचे नव्हे. हळूहळू ही विचारक्रांति लोकांत होत जाईल.
रंगो बापूजी मूळचा राजनिष्ठ हिंदी आदमी. महाराष्ट्राच्या हिंदू सम्राटाच्या राजगादीच्या हक्कांसाठीच लंडनात तो माथेफोड करीत बसला होता. आंग्रेजाविषयी आणि त्यांच्या न्यायबुद्धिविषयी लंडनला निघताना रंगोबाच्या मनात वावरत असलेल्या सर्व कल्पना, लंडनात पाऊल टाकताच मावळल्या. तेथली कोर्ट दरबारची कामे म्हणजे एका पद्धतशीर चक्रव्यूहाचीच रचना होय, हे त्याने ओळखले. कंपनीची कोर्ट नि हाऊस ऑफ कॉमन्स आणि लॉर्डस या ठिकाणी अर्जाअर्जी व्याख्यानबाजी नि भांडाभांडी करून थकल्यावर, अखेर -
इंगलीष दरबार हा बाजार आहे. दाद न लागे, तेव्हा इंगलीश प्रांताचे चालीवरून पाहता, सर्वत्र मुलखी लोक यांची कुदरत हुकमत पार्लमेंटचे मेंबरावर मोठी. सबब इंगलीष प्रांती सर्व जनास सदरहू मोकदम्याचा मजकूर जाहीर करावा.
असे ठरवून त्याने ते काम नेटाने हाती घेतले. आंग्ल लोकमत उठविण्यासाठी, वृत्तपत्रे, हस्तपत्रिका, लहान लहान पुस्तिका, पोस्टरे आणि जाहीर व्याख्याने वगैरे त्याच्या प्रचारतंत्राची हकिकत योग्य जागी या ग्रंथात दिलेलीच आहे. सारांश, महाराणी विकटोरिया जरी इंग्लंडची राणी असली तरी लोकानी निवडून दिलेल्या पार्लमेण्ट मेंबरांच्या सल्ल्यानेच तिला राज्यशकट हाकलावा लागतो, सत्ता लोकांची नि मत्ता राणीची, हा लोकशाहीचा देखावा रंगो बापूजीने स्वता जितका नि जसा पाहिला होता. अभ्यासला होता, तसा नि तितका हिंदुस्थानातल्या एकाही राजा महाराजाच्या, मुत्सद्याच्या किंवा क्रांतिवीराच्या कल्पनेलाही शिवलेला नव्हता.
(रंगो बापूजीच्या किंचित आधी इंग्रजांच्या लोकशाही राजवटीचा प्रत्यक्ष परिचय राजा राममोहन रॉयला झाला होता. तेथल्या अनुभवानेच हिंदी जनतेच्या सामाजिक नि धार्मिक सुधारणेचा त्याने जोरदार पुरस्कार केला. त्याशिवाय राजकारणी क्षेत्रांत हिंदी लोकांना आंग्रेजांपुढे टिकाव धरता येणार नाही. हा सिद्धांत पुकारणारा राममोहन रॉय हा लोकहितवादीनंतरचा दुसरा समाजवादी होय.)
सातारच्या छत्रपतींचे राज्य महाराष्ट्राच्या राजकारणी जीवनाचा आत्मा आहे. ते खालसा करून मऱ्हाठ्यांच्या भावना दुखवू नका, अशा अर्थाचे हिंदी नि मऱ्हाठी लोकांच्या हजारो सह्यांचे अर्ज तयार करून लंडनला पाठविण्याविषयी रंगोब ने खंडेराव बळवंत चिटणिसाला एक पत्र पाठविले होते-
येथे मी सत्तर हजारापर्यंत सह्या करून घेऊन पारलमेंटात अर्ज्या गुजरल्या. ही चाल हिंदुस्थानात माहीत नाही. परंतु हाली आपण सुरू करावी... मुंबई गवरमेंट म्हणतात, कंपनीचा आमल सातारचे मुलखात जाहल्यास ती हिंदू रयेत सर्वत्र मोठी खूश आहेत. याजकरिता हा क्रम जरूर केला पाहिजे. श्रीजगदंबेचे आणि सीवाजी छत्रपतीचे नाव घेऊन क्रम चालवावा.
या त्याच्या सूचनेतच आंग्रेजाचे लोकशाही शासन-तंत्राचे मर्म रंगो बापूजीने आत्मसात केल्याचे स्पष्ट सिद्ध होत आहे.
लोकशाहीला हिंदुस्थान प्रतिकूल
लोकमतानुसार महाराष्ट्रात छत्रपतीची पुनर्घटना करता येणे किती शक्य आहे आणि विलायती जनतेची `एकदिली व कुदरत` हिंदुस्थानात प्रचलित करता येईल का नाही, याचा अंदाज काढण्यासाठी, रंगो बापूजीने परत आल्यावर, उत्तर हिंदुस्थानात गुप्त वेषांतराचा दौरा काढला. त्या वेळी तिकडे आंग्रेजांविरुद्ध असंतोषाचे ज्वालामुखी ठिकठिकाणी धुमसत होते. तरी आंग्रेजाना भारतपार हुसकावल्यावर पुढे काय करायचे, याचा निश्चित विचार कोठेच काही त्याला आढळला नाही. असंतुष्ट शिपायांच्या फलटणीनी उठाव केला तर त्यांना वाजवी धाकात ठेऊन कडव्या लष्करी शिस्तीने आंग्रेज-निर्मूलनाचे आणि त्या नंतरच्या स्वकीय सरकारच्या स्थापनेचे कार्य एकसूत्री तडीला नेणारा एकही खंबीर नि लोकप्रिय नेता त्याला आढळला नाही. विलायती लोकराज्याची कल्पनाच कोणाला नव्हती. `राजाशिवाय राज्यच नव्हे आणि राजा म्हणजे श्रीविष्णूचा अवतार`, एवढी एकच भावना प्रबळ असल्यामुळे, आपले लोकशाहीचे विलायती पुराण रंगो बापूजीला गुंडाळूनच ठेवावे लागले असल्यास, त्यात नवलाला किंवा आश्चर्याला जागाच कोठे होती? `सत्ता रयतेची नि मत्ता राजाची` या त्याच्या विलायती व्याख्येचा अर्थच कोणाला नीट लागे ना.
अखेर - चला, अंग्रेजांचा काटा काढण्याच्या सगळ्यांच्या एकदिली नि एकमुखी कार्यक्रमात मीही सामील होतो. त्यांना हाकलून दिल्यावर राज्यशासन तंत्राचा तपशील मागाहून ठरवता येईल, असे निश्चित धोरण ठरवून, "उत्तरेला पंचारतीचा गजर झालेला ऐकू येताच, दक्षिणेत मी नौबदीवर टिपरी हाणतो" असे धोंडोपंत नानाला रंगोबाने वचन दिले आणि महाराष्ट्रात शिस्तबाज उठावाची तयारी केली. घरच्या नि दारच्या वैऱ्यांच्या कारस्थानी जाळ्यात आयत्यावेळी पकडला गेल्यामुळे, पुढे त्याचे बातबेत काय होते, अथवा त्याने काय केले असते, यांवर नुसत्या कल्पना लढविण्यात शहाणपणा नाही.
रंगो बापूजीचा यज्ञ यशवंतच झाला.
भगिरथाला शोभण्यासारख्या रंगो बापूजीच्या प्रयत्नाना यश आले नाही, असे वरवर विचार करणारांना वाटेल. वस्तुस्थिती निराळी आहे. बनिया कंपनीची डायरेक्टर प्रोप्रायटरांची कोर्टे आणि बोर्ड कंट्रोल यांनी हिंदुस्थानात चालविलेल्या जुलमी रावणशाहीविरुद्ध रंगोबाने इंग्लंडभर जी निषेधाची चळवळ केली, लॉर्डस नि कॉमन्स सभागृहांत जहाल वादविवादांचे स्फोटांवर स्फोट उडवले, आणि कंपनीच्या अरेरावी कारभाराने सर्व जगात इंग्लडची झालेली बदनामी ब्रिटिश जनतेला पटवून, त्यांच्याही जळजळीत धिक्कारांचा प्रगट पाठिंबा मिळवला, त्याचाच परिणाम, कंपनीला पदच्युत करून, हिंदुस्थानाचे राज्य विकटोरिया राणीने पार्लमेंटाच्या हाती देण्यात झालेला आहे. हे दृष्टीआड करून भागणार नाही.
आंग्रेजांच्या नि जगाच्या दृष्टीने सत्तावनचे बण्ड जरी यशवंत झाले नाही, तरी आंग्रेजी बनिया कंपनीच्या रावणशाहीला नेस्तनाबूत करणाऱ्या सत्तांतराचे श्रेय रंगो बापूजीचेच होय. स्वदेशासाठी, महाराष्ट्राच्या छत्रपतीच्या तक्तासाठी, त्याची काया, वाचा, मन आणि धनसुद्धा सतत १४ वर्षे त्याने विलायतेत चंदनासारखे झिजवले. यापुढे आंग्रेजांशी कायद्यांची किंवा वायद्यांची होड घेण्यापेक्षा, समोरासमोर लढाईच्या सामन्यानेच त्यांचा आमचा काय होईल तो सोक्षमोक्ष लावून घेतला पाहिजे, या निश्चयाने त्याने महाराष्ट्रात उठावणीचा यत्न केला. त्यात त्याचा मर्द पुत्र सीताराम आणि अनेक आप्तमित्र फासावर चढले. त्याच्या कुटुंबाची वाताहात झाली. त्याच्या रहात्या घरादारांवर आंग्रेजानी खरोखरच गाढवांचे नांगर फिरवले. आणि अखेर स्वत: रंगो बापूजी वनवासात अज्ञातावस्थेत कोठेतरी दिवंगत झाला. हिंदवी राज्यक्रांतीच्या पुण्याईच्या दरबारात त्याला कोठे कोणते स्थान द्यायचे, हे न्यायी नि निस्पृह वाचकांवरच सोपवलेले बरे.
मुंबई नं. २८
ता. ३१ डिसेंबर १९४७.
केशव सीताराम ठाकरे.