पोटाचे बंड, माणसातील सुरवंट
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
पहिल्या आवृत्तीविषयी
पोटाचे बंड, माणसातील सुरवंट
लेखक प्रकाशक
केशव सीताराम ठाकरे
प्रबोधन ऑफिस, पुणें शहर
प्रकाशनवर्ष १९२४
माणसातले सुरवंट
या जगात अनंत आश्चर्ये आहेत. आश्चर्यांनी ही सृष्टी नटलेली नसती, तर इहलोकीची जीवनयात्रा अत्यंत उदासीन व कष्टप्रद झाली असती. कोठेही नजर टाका, जिकडे तिकडे काहीं ना काही आश्चर्य म्हणून आहेच. पृथ्वीच्या अगाध उदरातील खनिजद्रव्यांच्या चमत्कारांपासून तो थेट मनुष्यस्वभावाच्या चमत्कारापर्यंत एकापेक्षा एक वरचढ अशा अनंत आश्चर्यांनी आपल्या सभोवारची ही सृष्टी आरपार फुललेली आहे. परंतु सर्वसाधारण मनुष्याला या आश्चर्याचे निरीक्षण व अभ्यास करण्याइतकी फुरसद नसते म्हणा किंवा प्रवृत्तीच नसते म्हणा. विशेषतः साता कोसावरचे दिसतें, पण हाताजवळचें भासतसुद्धा नाहीं, हा माणसाचा स्वभाधर्मच पडल्यामुळे, हा स्वभावधर्मच केवढे मोठे आश्चर्य आहे, याची कोणी सहसा दाद घेत नाहीं.
इतर सर्व शास्त्रांपेक्षा मानवस्वभाव - निरीक्षण व परीक्षण हे एक महत्त्वाचें शास्त्र आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती ही म्हण आपण नेहमी बोलतो व लिहीतो. पण ह्या भिन्न भिन्न प्रकृति निरनिराळ्या व्यक्तीत का दिसतात, त्यांचा परिपोष कसा होतो, त्या प्रकृतीचा व्यक्तीच्या अंतर्बाह्य चारित्र्यावर काहीं ठसा उमटतो कीं नाहीं, उमटत असल्यास त्याचें परीक्षण कसें करावें, इत्यादी प्रश्नांचा विचारच कधी आपल्याला सुचत नाहीं. मानसिक विकारांची सारी घडामोड अंतःकरणांत चाललेली असते. त्या घडामोडीचे प्रतिबिंब चेहऱ्यावर स्पष्ट उमटतें. म्हणूनच एका तत्त्ववेत्त्यानें म्हटलें आहे कीं मनुष्याचा चेहरा म्हणजे अंत:करण घड्याळाची तबकडी होय. या तबकडीवर सर्व विकारांचे काटे बिनचूक फिरत असतात. इतकेंच नव्हें तर त्यांच्या बिनचूक विकारदर्शनाचीं ठोकळ चिन्हें चेहऱ्यावर कायमची ठसली जातात.
फिझिऑनमी म्हणजे चेहरेपट्टीवरून स्वभाव-परीक्षण करण्याचे एक स्वतंत्र शास्त्रच आहे. या शास्त्राच्या साह्यानें व्यक्ती तितक्या प्रकृती कशा? एवढ्याच प्रश्नाचे उत्तर मिळते असे नव्हे, तर वदनाकृतीवरून प्रकृतीचेही तंतोतंत निदान ठरविता येतें. नेहमीच्या व्यवहारांत किंचित चिकित्सक दृष्टीने माणसांच्या चेहरेपट्टीचा त्यांच्या बोलण्या चालण्याशी व आचार विचारांशी तुलनात्मक निरीक्षणाचा अभ्यास ठेवला, तर कांही दिवसांनी फिझिऑनमीचें शास्त्र न पाहतांहि आपल्यास मानव स्वभावपरीक्षणाची कला हस्तगत होणे शक्य आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्याचें ज्ञान करून घेणें प्रत्येक विचारी व व्यवहारी मनुष्याला हितकर आहे.
हा अभ्यास वाटेल तेंव्हा वाटेल तिथे सुरू करतां येतो. याला भांडवल लागत नाहीं. गुरूपदेशाची जरूर नाही. साहित्याची अडचण नाही. डोळे उघडे असले म्हणजे झाले. निरीक्षणाची कसोशी, मननाची पराकाष्ठा आणि आपले सिद्धांत आपणच पडताळून पाहण्याची न्यायनिष्ठुरता, एवढ्या सामुग्रीवर हा अभ्यास तोंडातून एक अवाक्षरही न काढतां इतका बळावतो कीं पुढे नुसता फोटो पाहूनसुद्धा एखाद्या माणसाच्या स्वभावाचें अचुक निदान ठरविता येते. ह्या मनोरंजक विषयाकडे प्रबोधनाच्या वाचकांचे लक्ष वेधावें, म्हणून माणसांतले सुरवंट कसे असतात याचा थोडा शब्दपरिचय करून देण्याचे योजिलें आहे.
सुरवंट हा कीटक पितर पक्षांतल्या हंगामांतच विशेषतः उत्पन्न होतो आणि `पितरपाखांतली खीर` खाल्ली की गुप्त होतो. माणसांतले सुरवंट असेच खिरीचे मोठे भोत्ते असतात. यांचा आणि श्रीमंतांचा मोठा परिचय. हे नेहमीं श्रीमंतांच्या भोवती गोंडा घोळीत फिरत असायचे. यांचे पीक हिंदुस्थानाइतके इतर कोणत्याही राष्ट्रांत उमप पिकत नाही. हिन्दुस्थानांतल्या राजेरजवाड्यांनीच या सुरवंटांची अवलाद या देशांत प्रथम मुबलक पैदा केली; आणि त्यामुळेच आज हिंदू श्रीमंतांचे दिवाणखाने व अंगणे या प्राण्यांनी गजबजून गेलेली आढळतात. श्रीमंतांना या सुरवंटांचे महत्वही तसेच जबरदस्त आहे. जगांतून हे मानवी सुरवंट जर नाहीसे झाले किंवा केले, तर श्रीमंतांना आपल्या खऱ्या खोट्या श्रीमंतीचीच काय, पण खुद्द माणुसकीची बॉब तिव्हाट्यावर येऊन स्वतः मारावी लागेल.
शेणाच्या कुझक्या पोहोट्यांत ज्याप्रमाणें विंचू महाराज आपले बिनचूक उदयास येतात, त्याप्रमाणे श्रीमंतीच्या उबाऱ्यांत हे मानवी सुरवंट आपोआप झळकू लागतात. श्रीमंतांच्या बेअक्कल पोरांचा जन्म होऊन त्यांच्या तोंडात मधाचा बिंदू जाण्यापूर्वीच या सुरवंटांच्या स्तुतिपाठाचा पाट आई-बाप आणि ते पोर यांच्या कानांत धो धो कोसळतो. पावसाने डोळे वटारून साऱ्या सृष्टीला तब्बल बारा वर्षे जरी निर्जळी एकादशी घातली, तरी श्रीमंतीच्या उबाऱ्यावर जगणाऱ्या सुरवंटाच्या स्तुतिपाठाच्या पाटाचे पाणी रतिमात्र हटायचे नाही. सुरवंट हा श्रीमंतांचा `सर्वंट` असो वा नसो, त्याच्याशिवाय श्रीमंतांच्या श्रीमंतीला विधवेप्रमाणे दाहीदिशा शून्य होतात.
आपली श्रीमंती विधवा होऊ नये, आपल्या वैभवाचा डांगोरा पोटांतल्या पोटांत जिरू नये, आपल्या बाष्कळ व थिल्लर वर्तनाचें लोकांत नागवें प्रदर्शन होऊ नये आणि आपण स्वतः इतर प्राकृत माणसांप्रमाणेच माणूस आहो ही जाणीव इतरांस व खुद्द स्वतःसहि होऊ नये, म्हणून मानवी सुरवंटांचे थवेच्या थवे जवळ बाळगिण्याचा संप्रदाय प्राचीन भारतीय राजेलोकांनींच सुरू केल्यामुळें, तो आजपर्यंत अव्याहत चालू ठेवण्याचें पुण्य कार्य सध्यांचे राजे व गर्भश्रीमंत लोक करीत असतात. काय करतील बिचारे! वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकून चालणारीं हीं इमानी मेंढरें!! राजे व श्रीमंत तोंड असून मुके, कान असून बहिरे, डोळे असून आंधळे आणि माणूस असून बेअक्कल कां? अशी शंका पुष्कळांना पुष्कळ वेळां येते.
श्रीमंतांचीं शेंकडा ९९ पोरें मूर्ख, लहरी व पोरकट का असतात? याचेंही पुष्कळांना कोडे पडतें. परंतु माणसांतला सुरवंट हा प्राणीच असा पराक्रमी आहे कीं श्रीमंतांच्या श्रीमंतीला त्याची झाळ लागतांच हे सर्व चमत्कार घडविणें त्याच्या बत्तीस दातांचा मळ! श्रीमंतीच्या उबाऱ्यांत जन्मलेली आणि त्या उबाऱ्यावरच जगणारी ही माणसांतल्या सुरवंटांची संख्या हिंदुस्थानात अलीकडे इतकी भरमसाट फुगली आहे कीं त्यांची एक स्वतंत्र जातच बनली आहे. सुरवंटाचा एक संप्रदायच निर्माण झालेला आहे. या सुरवंटांचे मुख्य आकर्षण-केंद्र जरी श्रीमंतांचे कासोटे व पायजमे असले, तरी त्यांच्या चळवळी समाजांत सर्वत्र सुरू असतात. हा प्राणी दिसतो तसा नसतो. याचा चेहरा बावळट असला तरी अंतःकरण अचाट खटपटीत गुंग असतें. अंतःकरणांतले विकार चेहऱ्याच्या तबकडीवर केंव्हाच उमटू न देण्याची त्याची कुशलता वर्णनीय नसली तरी निरीक्षणीय खास असते.
सुरवंटांच्या संप्रदायाचा गंडा मनगटावर चढविण्यापूर्वी प्रत्येक उमेदवाराला आपल्या हृदयाच्या कारभाराच्या दोऱ्या चेहरा तबकडीपासून आमूलाग्र उखडून काढाव्या लागतात. तोंडात दातांची बत्तिशी शिल्लक असो वा नसो, आपल्या श्रीमंत पुरस्कर्त्याच्या तोंडून निघणाऱ्या बऱ्यावाईट शब्दाला हीहीहीहीचें आगत स्वागत देण्यासाठी त्याची बत्तिशी हुकमी सजा पाहिजे. त्याच्या पाठीचा कणा बजरंग बलीच्या सोट्याप्रमाणे ताठ आणि कणखर असला, तरी श्रीमंतांच्या समागमांत येतांना कमरेपाशी तो धनुकली प्रमाणे वांकविलेला असावा. खऱ्या खोट्याची चाड मुळीच न बाळगिण्याइतकी त्याची मनोवृत्ति परमहंस बनलेली असावी. उमेदवाराला चहाचे व्यसन असो वा नसो, त्याने चहाड्या चुगल्या सांगण्याची कला उत्तम हस्तगत नव्हे, जिव्हागत करून ठेवलीच पाहिजे.
श्रीमंतांना पंचपक्वान्नांच्या मेजवानीपेक्षां चुगलखोरांच्या चुगल्या खाण्याची फार आवड असते. वेळीं अन्नपाण्याशिवाय श्रीमंत लोक पंधरा वीस दिवस सहज जगतील, पण सुरवंटांच्या चहाड्यांशिवाय ताबडतोब आत्महत्या करतील. श्रीमंतांच्या प्रत्येक सुस्काऱ्याला एकदा हां व एकदां जी करण्याचा सुरवंटांचा संप्रदाय असल्यामुळे, कोणी त्यांना हांजीहांजीखोर असे म्हणतात. त्यांना श्रीमंतांनी कधि झिडकारलें लाथाडलें तरी बिनचुक त्यांची पिकदाणी धरायला ते राजीखुषीनें अक्कलहुशारीनें धांवतात, म्हणून त्यांना कोणी जेहत्ते लाळघोटे असेंही म्हणतात. देवाला जसे संध्येतल्या निरनिराळ्या २६ नावांनी हाका मारल्या तरी देव अखेर एकच, तसें हांजीहांजीखोर, लाळघोटे, पाजी, चुगलखोर, भाडखाऊ वगैरे अनंत नावें या महात्म्यांना कोणी दिली, तरी अखेर यांचे खरें नांव माणसांतले सुरवंट हेंच होय.
प्राचीन राजे लोकांनी या सुरवंटांना खुद्द दरबारांत मानाची खुचीं देण्याची वहिवाट पाडल्यामुळे, त्यांच्या पागलपणाची मोठी चलती उडाली. दरबारी खुषमस्कऱ्या व दरबारी मानकरी या दोघा नंदीबैलांत खुषमस्कऱ्याची पायरी वरची. मानकरी खुषमस्कऱ्या असे किंवा खुषमस्कऱ्या मानकरी बनत नसे असें नाहीं. पण खुषमस्कऱ्यांचे पाऊल थेट सरकारस्वारीच्या रंगमहालापर्यंत लांबत असे; मानकन्याला आपल्या मानेभोवतीच गिरक्या मारीत फिरावे लागत असे, एवढाच फरक. खुषमस्कऱ्याला जिव्हाचांचल्य आणि चुगलखोर लाळघोटेपणा एवढ्याच भांडवलावर राजाच्या हृदयाच्या अंतरंगापर्यंत जाण्याची परवानगी; पण शत्रूचा पाडाव करून आलेल्या सरधोपटमार्गी तलवार बहाद्दर गड्यास मानसन्मानाची दरबारांतल्या दरबारांत बोळवण. असा प्रकार असल्यामुळे सुरवंटांचा समुदाय सहाजिकच अधिक वाढला आणि अखेर त्यांचे रूपांतर देशद्रोही देशघातकी मातृगमन्या नरपशूंच्या संख्याधिक्यांत झालें.
सुरवंट हे बोलून चालून खिरीचे भोत्ते. खीर संपली की सुरवंट गेले. गेले म्हणजे मेले नव्हेत. सुरवंटाचे फुलपाखरांत रूपांतर होते. सुरवंट असतांना धिमेधिमे रांगणारा प्राणी रूपांतरांत मनस्वी भराऱ्या मारणारा बनतो. राजेरजवाड्यांच्या प्राचीन खुषमस्कऱ्यांची संस्था आज जरी नामशेष झाल्यासारखी दिसत असली, तरी विद्यमान राजांच्या भोंवती निरनिराळ्या रूपांतरानें सुरवंटांचींच कुंपणे पडलेली आहेत. त्याचप्रमाणे खुशालचेंडु श्रीमंतपुत्रांची दालनें, अचाट बुद्धि चालवून बळेच लक्ष्मी मिळविलेल्या श्रीमंतांची माजघरें आणि एखादी विशिष्ट चळवळ चालविणारांना मधून मधून उगाच लहरी दाखल देणग्या देऊन स्वतःचा बडेजाव माजविणारांच्या ओसऱ्या सध्या नानाविध सुरवंटांनी नुसत्या गजबजलेल्या आहेत.
हिंदुस्थानच्या राष्ट्रीय अस्तित्वाची व त्याच्या स्वातंत्र्याची जर कोणी राखरांगोळी केली असेल तर या चुगलखोर सुरवंटांनींच होय. गझनीच्या महंमदाच्या स्वारीपासून तो थेट सातरची छत्रपतीची गादी ईष्ट इंडिया कुंफणीच्या आंगाखाली जाईपर्यंत, नव्हे, १८५७च्या बंडापर्यंत, हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यार्थ जे जे बरे वाईट प्रयत्न झाले, त्यांच्या नाशाला या हरामखोर चुगलखोर लाळघोट्यांची सुरवंटशाही कारण झाली, असा इतिहासाचा पुरावा आहे. सातारच्या प्रतापसिंह छत्रपतीला ह्याच स्वराज्यद्रोही स्वार्थी चोरांनी राज्यभ्रष्ट कसें केलें आणि सत्तावनच्या बंडांत कोणकोणत्या मानवी सुरवंटानीं चहाड्या चुगल्यांच्या चुल्हाणावर रंगो बापूजी गुप्त्यासह शेकडों राष्ट्रसेवकांना जिवंत भाजले, याचा इतिहास याच लेखणीतून प्रबोधनच्या आश्रयदात्यांच्या सेवेला क्रमशः रुजू होत आहेच.
तत्कालीन चुगलखोरांनी हिंदवी स्वराज्याचा मुर्दा पाडून त्याच्या रक्तावर आपल्या जहागिरी व इनामें वंशपरंपरा रंगवून घेतली, आणि आपल्या पुत्रपौत्रादिकांना `पितरपाखांतल्या खिरी`ची अखंड सोय करून ठेवली. आज तर ही चुगलखोर सुरवंटांची संस्था हिंदी राजे, श्रीमंत व कोट्याधीश गिरणी कारखानदार यांनी चांगलीच आश्रय देऊन चालविली आहे. हल्ली देशांत ज्या अनेक चळवळी सुरू आहेत, त्यांतही या राजे व श्रीमंत लोकांनीं आपल्या सुरवंटांची मुगलक पेरणी पेरून ठेवली आहे. उद्यांची अपेक्षित भारतीय लोकशाही म्हणजे राजेशाही व श्रीमंतशाही यांच्या उरावर फिरणारा रावणी वरवंटा होय, ही त्यांची खात्री असल्यामुळे त्यांना आपल्या सुरवंटांमार्फत प्रत्येक चळवळीत फाटाफूट पाडून आपले सुरवंटी ऐश्वर्य कायम राखण्याचा प्रयत्न करणे आवश्यकच होऊन बसलें आहे. कित्येक श्रीमंत आपल्या सुरवंटांमार्फत आपल्या नकली जनसेवेची टिमकीही पिटवून घेत असतात. सारांश सध्याचें हिंदीराष्ट्र हे चुगलखोरांचें राष्ट्र बनले आहे. श्रीसमर्थ आज अवतीर्ण झाले तर ते एकदम संतापानें ओरडून म्हणतील कीं,
देशद्रोही तितुके कुत्ते। मारोनि घालावें परते।।
चुगलखोरी आणि हांजीहांजीखोरपणा ह्या दोन दुर्व्यसनांचा आज फार फैलाव झालेला आहे. प्रत्यक्ष खुनी माणूस पत्करला; पण हे हांजीहांजी करणारे लाळघोटे दगलबाज पत्करत नाहींत. खऱ्याचें खोटें आणि खोट्याचे खरे करणें ही त्यांची सहजलीला. खुनी माणसाचें काळीज उरफाटें असतें असें म्हणतात; पण या लाळघोट्यांना मुळी काळीजच नसतें. ज्यांचे अंत:करणच मेलेले, त्यांना विवेक कसला आणि लाजलज्जा तरी कसली? लाज जाळल्याशिवाय लाळ घोटताच येत नाहीं. ज्यांनी लज्जेलाच लाजविली, त्यांना या जगांत वाटेल तें दुष्कर्म करण्याची मुभा! धर्मार्थ मिळविलेल्या तांदुळाचा भात त्यांच्या खुशाल पचनी पडतो.
शिक्षणप्रसारार्थ जमविलेला फंड शेतांत गुप्त झाला किंवा सार्वजनिक बोर्डिंगसाठी आणलेले पत्रे त्यांच्या घरांवर उड्या मारून गप्प बसले, तरी त्यांच्या मनाला काहीं दिक्कत वाटत नाहीं; कारण या प्राण्यांना मुळी मनच नसतें. असले हृदयशून्य लोक राजे व श्रीमंतांच्या पदरी असल्यामुळेंच त्यांच्या दुष्कृत्यांवर सफेदा चढतो व लोकांत त्यांची कीर्ती होते. माणसांतल्या सुरवंटांची खरीखुरी हालचाल ते श्रीमंतांची मनधरणी करीत असतांना व त्यांच्या मागें मागें गोंडा घोळवितांना वाटेल त्यानें मुद्दाम निरीक्षण करावी, म्हणजे माणसाची माणुसकी किती नीच अवस्थेपर्यंत येऊन पोहोचते, हें चांगलें कळेल. असले स्वार्थासाठी वाटेल त्याचा गळा कापण्यास मागेंपुढें न पहाणारे माणसांतलें सुरवंट ठिकच्या ठिकाणीं ठेचण्याची ठोशेबाजी ठणकाऊन सुरू केल्याशिवाय हिंदुस्थानाची लोकशाहीच्या मार्गावर प्रगति होणें बरेच दुरापास्त आहे, एवढीच सूचना सध्या पुरे.
(प्रबोधन, वर्ष ३ रें, अंक १० वा, ता. १-३-२४)