पावनखिंडीचा पोवाडा
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
दुसऱ्या आवृत्तीचं पहिलं पान
"आम्ही सूरमर्द क्षत्री! नाही भिणार मरणाला॥
-
शाहिर तुलशीदास
॥ श्री शिवछत्रपती महाराज की जय॥
पावन खिंडीचा पोवाडा
आवृत्ती २ री
बळी दिला तूं तुझ्या जिवाचा केवळ मजसाठी
राष्ट्रोन्नतिची जणू बसविली कोणशिळा मोठी
प्रकाशक – केशव सीताराम ठाकरे,
प्रबोधन ऑफिस,
३४५ सदाशिव पेठ,पुणे शहर.
किंमत एक आणा.
वीररत्न बाजीप्रभु देशपांडे
याच्या संबंधाने
कै. न्यायमुर्ती रानडे यांचे उद्गार
"प्रसंग फार कठीण आला, पण अशा वेळी बाजी प्रभुने बाजू राखली. शिवाजी महाराज रांगणा किल्ल्यावर सुखरुप जाऊन पोचल्याच्या तोफा ऐकू येईपर्यंत हा शूरवीर रस्त्यावरील एका अवघड खिंडीच्या तोंडाशी फक्त १००० लोकांनिशीं उभा राहिला. विजापूर सरदारच्या अवाढव्य सैन्याने आपली होती नव्हती तेवढी अक्कल खर्च केली, पण या बहाद्दाराने त्यात एक पाऊलही पुढे टाकूं दिले नाही. किती तरी जखमा लागल्यामुळे हा वीर रक्ताने अगदी न्हाऊन गेला होता. त्याच्या अंगी उभे राहण्याचीहि ताकद राहिली नव्हती. तरीही रांगण्यावरील (खुणेची) तोफ ऐकेपर्यंत त्याने रणांगण सोडले नाही. शेवटची तोफ ऐकली तेव्हा या वीराने आपला प्राण सोडला. काय ही स्वामिभक्ति आणि काय हा स्वदेशाभिमान! अशी नररत्ने शिवाजीच्या साहाय्यास नसती तर शिवाजीच्या हातून काय झाले असते?"
मराठयांच्या सत्तेचा उत्कर्ष पृष्ठ ४९
प्रस्तावना
या लोकपिय पोवाडयाची पहिली आवृती ता. २९ मे सन १९१८ रोजी निघाली व त्याच दिवशी वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांच्या वार्षिक सार्वजनिक स्मृतिदिनाचा उपक्रम ज्योतिर्माला कचेरीच्या दिवाणखान्यांत दादर येथे प्रथम करण्यात आला. तेव्हांपासून हा स्मृतिदिन महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दरसाल नियमित साजरा होत असतो. बाजीप्रभूंच्या आत्मयज्ञाची तिथी कोणती? हा वाद-इतर तिथ्यामित्यांच्या वादाप्रमाणेच-उपस्थित झाला आहे, तरी स्मृतिदिनाच्या वार्षिक समारंभांत कोठे खंड पडत नाही. ही आनंदाची गोष्ट होय.
मुख्य प्रश्न स्मृतिदिनाचा आहे, तिथीच्या गुलामगिरीचा नव्हे. बाजीप्रभूंचे खास वंशज कै. विनायकराव देशपांडे (मेजर सुभेदार लक्ष्मणराव देशपांडयांचे बंधू) यांनी २९ मे ही तारीख संग्रहीच्या कागदपत्रावरून श्री ठाकरे य़ांस कळविली होती. श्रीयुत बेंद्रें प्रभृति संशोधक आषाढ व. ०१ म्हणतात. ठीक आहे. कोणतीहि तारिख धरा, पण बाजीप्रभूला स्मरा. कारण:-
बाजी गेला कीर्त करूनिय़ा बखरी त्य़ा गाती
विसरे ज्य़ा दिनिं महाराष्ट्र त्य़ा खाइल ते माती
ही प्रस्तुत शाहीराची `तलाख` आहे. हा पावन खिंडीचा पोवाडा महाराष्ट्राच्य़ा सर्वच क्षेत्रांत पडलेल्य़ा भेदभावाच्य़ा खिंडाराना एकजिनसि एकीच्य़ा चैतन्याने पावन करो?
सज्जनांचा कृपाभिलाषी,
रामचंद्र वामन चित्रे (बी.ए.)
सह- संपादक मासिक प्रबोधन,
प्रबोधन कचेरी,
पुणे शहर.
ता. १ आँगष्ट १९२५.
"आम्ही सूरमर्द क्षत्री! नाही भिणार मरणाला॥
शाहिर तुलशीदास.
॥ श्री शिवछत्रपती महाराज की जय॥
पावन खिंडीचा पोवाडा
अर्थात्
वीररत्न बाजीप्रभू देशपांडे
यांचा आत्मयज्ञ.
चाल:-विजयादशमी सण विजयाचा
जय जय अंबे माय भवानी तुळजापुरवासी॥
उदो उदो श्री जय जगदंबे रक्षि बाळकांसी ॥ धृ०॥
गोंधळ अंबे! तुझा घालण्या अनन्य भावाचा॥
दिवटा घेउनि करी नाचतो शाहिर शिवबाचा ॥ १॥
तुझ्या कृपेची पांखर अंबे! कवनावरि पाडी॥
पहा कसा मग कवि मोत्यांचा जणुं पाऊस पाडी॥ २॥
तुंच नाहिं कां केलें अंबे! शिवबाला धन्य॥
सांग कुणाच्या पदी रिझे तो तिजवांचुनि अन्य॥३॥
आळविले तुज परोपरीनें रामाच्या दासें ॥
कुठें जाउं मी टाकुनि असलें मोक्षदपद खासें॥४॥
स्फूर्तीच्या तेलांत भिजविला दिवटा कवनाचा॥
पेटविला बघ नाचुनि गातो शाहिर मानाचा ॥५॥
मीच नाचलो शिवबापुढती रायगडावरती ॥
थाप डफावर पडे पडे तों अस्तानि हो वरतीं ॥६॥
मी मी म्हणुनी पुढें सरकले शुर वीर गाजी ॥
हाच भराडी ललकारीनें चेतवि गज बाजी ॥७॥
चाल ॥जय उदो उदो अंबेचा ॥जय०॥
जगदंबेचा। महाराष्ट्रचा ॥
ऐळकोट मार्तंडाचा। जय छत्रपती शिवबाचा॥
जय किल्ले रायगडाचा॥ जय भगव्या जरिपटक्याचा॥
हर हर हर हर महादेव गर्जना करा खाशी॥ उदो०॥
२
वर्दी गेली विजापुरला पडला अफझुल्ला॥
तुटला उजला हात शहाचा झाला बहु गिल्ला॥१॥
बिकट पेंच हा पडला होता खुद्द शिवाजीला ॥
कारण अतिशय शूर वीर लढवय्या अफझुल्ला॥२॥
अफाट सेना निवडक हाती दैत्यासम शक्ती॥
पंरतु करिता मात म-हाठे धन्य राष्ट्रभक्ती॥३॥
वाघनखाच्या कचक्यासरसा लोळविला खालीं॥
कदरबाज महाराष्ट्र म्हणुनिया गोष्ट अशी घडली॥४॥
जय हर जय हर म्हणतां शिवबा निशाण विजयाचें॥
उंच फडकतां येत मावळ्यां भरतें शौर्याचें॥५॥
नायक पडतां मोंगल हटलें धैर्य सर्व सुटलें॥
त्यांत मावळे हल्ला करितां धूम पळत सुटलें॥६॥
प्रतापगडचा प्रताप सारा स्वार्थत्यागाचा॥
राष्ट्रभक्तिचा, धारिष्टाचा, अचाट हिमंतीचा॥७॥
महाराष्ट्रच्य़ा धर्मावरचे संकट हे मोठ॥
श्रीअंबेने पार पाडिले अडलें नच कोठे॥८॥
चाल॥मन एक सर्व राष्ट्राचें ॥मन०॥
एक मताचे एक जिवाचे॥
य़ानेच दिले य़श कार्या॥ गुरूकिल्ली ही चिर विजया॥
भुलवी न कुणा रिपुमाया॥ ये धांवत लक्ष्मी पायां॥
गजांत लक्ष्मी ऐश्र्वर्यातें करि शिवप्रभु दासी ॥ उदो०॥
३
पडतां समरी पिता चढे तो त्वेषहि पुत्राला॥
फाजल महमद उठे कडाडुनि घे करिं शस्त्रला ॥१॥
पातशहाला घि:कारुनि तो वदे "कसे बसला॥
"स्वस्थ षंढ हो! चिरडि शिवाजी माझ्या बापाला ॥२॥
पहाडका वो चुव्वा काफर क्यों मिले जिंदा"!॥
"मैं अकेला खतम करुंगा " अशी करी निंदा ॥३॥
शिवयुक्तीच्या पुढती फोल सर्व सक्ती॥
कुणी कुणावर करु शकेना युद्धाची शक्ती ॥४॥
ठका महाठक असा रचनिया कपटाचा कावा॥
निघे संगरी फाजलु घ्याया शिवकंठी चावा ॥५॥
शिद्धी सरजाखान निघाले घेउनि सैन्याला॥
जाणुनि पुरतें मनी भेटण्या जातों दैन्याला ॥६॥
" जंगलका वो शेर शिवाजी " पन्हाळ किल्याला॥
आला ऐंशी खबर लागता वेढा त्या दिघला ॥७॥
जाळ्याध्यें पुरा पकडला सिंह म-हाठयांचा॥
वाटे सर्वां येथ बुडाला बेत शिवाजीचा ॥८॥
चाल॥ लागली तात मानेला ॥लाग०॥
श्रीशिवप्रभुच्या। महाराष्ट्राच्या ॥
धडकले सैन्य त्या रिपुचें ॥ चढविले घमघमे मोर्चे॥
यावनी वीर नच कच्चे॥ जावते बंद किल्याचे॥
पहा पहा शिव झाला अंबे! कारागृहवासी ॥उदो०॥
४
दाणा वैरण दारुगोळा भरपुर किलल्याला॥
होता म्हणूनी जुमानिले ना परकी हल्याला ॥१॥
किल्याखालुन तोफ सुटे ये गोळा परतुनि॥
वरुनि लोटतां सहज दगड रिपु मरती चिरडोनि ॥२॥
तोफातोफी बहुतचि केली मरे न मरगट्टा॥
हिंमत खचली जरि तो फाजिल हिंमतीचा कट्टा ॥३॥
वरचा मारा अचाट मारी शत्रुसैन्य भारी॥
तारी ज्याला तुळजादेवी त्यास कोण मारी! ॥४॥
कितिक महाटे फकिरवेषें शत्रुगणी घुसले॥
खुशाल फिरुनी वेध काढिती कुणा न ते दिसले ॥५॥
दाणा वैरण मिळे न रीपुला कारण नेताजी॥
रोंखुनि बसला बाहिर सगळ्या वाटा रणगाजी ॥६॥
किल्यावरचा मार त्यांत भर उपासमार झाली॥
विजापुराची सर्वच सेना रडकुंडी आली॥ ७॥
मुसलमान आणि शूर मराठे चार मास ल़ढले॥
मिळे न किल्ला चढे न हल्ला मुसलमान थकले ॥८॥
चाल॥ ‘चल छोड देवजी किल्ला’॥ चल०॥
एकच गिल्ला। करीती हल्ला॥
मग धीर देत त्या शिध्दी॥ "ही योग्य म्हणे नच बुध्दी॥
"येईल आपणां सिध्दी॥ संपली रिपूची सद्दी॥
"ताडताड तट फोडुनि जातों या या पाठीशीं॥उदो०॥
५
सावधान द्या श्रोतेगणहो। झोंपु नका कोणी॥
नातरि ठरविल बहि-यापुढची ही माझी गाणीं॥१॥
राष्ट्रविनाशक काळझोप कां अझुनी नच गेली॥
डुलक्या पाहुनि वाटे तुमची हितबुध्दी मेली॥२॥
कशास चिडतां प्रियबांधवहो ?वटारितां डोळे॥
सांभाळाहो! शिद्धि फेंकतो तोफेचे गोळे ॥३॥
अनेक युक्त्या वरवर करि जरि देह शिवाजीचा॥
विसरुं नका त्यामधे विहरतो आत्मा बाजीचा॥४॥
बाजी म्हणतां नाक मुरडतो? हा नच तो बाजी॥
ज्या नामदें राज्य गमवलें ठरवि तुम्हां पाजी ॥५॥
शिवरायाचा केवळ आत्मा सागर शौर्याचा॥
प्रभूवीर तो बाजी झाला विषय पोवाडयाचा॥६॥
चार मासपर्यंत झुलविली मुसल्मान सेना॥
फाजल शिद्धी खुद्ध डुलविती आश्रयें माना॥७॥
ज्या कायस्थें रक्त ओतिलें शिवप्रभुच्या कार्या॥
अग्रगण्य हा बाजी त्यांतिल पूज्य सर्व आर्यां॥८॥
॥चाल॥जोहर चढवि मग हल्ला॥जोह०॥
अति निकाराचा॥ प्राणान्तीचा॥
रोखिली तोफ ती बुरुजा ॥करि फक्त मुख्य दरवाजा॥
‘जय’ म्हणति म-हाठे ‘तुळजा’॥‘देशाचि राख तूं लज्जा’
हां हां म्हणतां करील सर तो फाजल किल्ल्यासी॥उदो०॥
६
दाणा दारू सर्व संपली उरलि मात्र चिंता॥
प्रसंग आला बिकट सुचे ना अक्कल श्रीमंता॥१॥
शिवाजी बाजी कृष्ण पार्थ जणु करिती एकांता॥
टाळ्या मारित ‘ठरले’ म्हणती टळवूं आकांता॥२॥
शह उठवा मग तह करण्याला शिवराजा राजी॥
कळवी ताजी खबर शिध्दिला परस्परां बाजी॥३॥
तहनाम्याचें वृत्त ऐकतां फाजलखां रमले॥
कारण होते सैनिक त्याचे अतिशय दमलेले॥४॥
"अच्छा अच्छा बहोत खाशी तहनामा करना"
सैनिक म्हणती जल्द करो अभि क्यौं नाहक मरना॥५॥
कंडि पसरतां थंडी पडली मुस्लमान सेना॥
खाना पीना चम्मच रंडी दारू नाच गाना ॥६॥
घोडयावरचे जीन उतरले तोफाही निजल्या॥
मेजवानीच्या हंडया सगळ्या छावणींत शिजल्या॥७॥
जिकडे तिकडे रंगराग कुणी गाती कुणी खाती॥
आतां ऐका काय म-हाठे किल्ल्यावर करिती॥८॥
॥चाल॥ पाहुनी ढिलाई रिपुची॥ पा०॥
फाजलखांची ॥ जोहराची ॥
छातिचा कोट मग केला॥ शिवप्रभु पुढारी झाला॥
सोडिला पन्हाळा किल्ला ॥तुडवीत मोंगलां गेला॥
निशेमधें जे पिसे शिपाई कोण पुसे त्यासी॥ उदो०॥
७
अरी करीं तो दउनी निसटुनिया गेला॥
अशी वंदता कळतां फाजल वदे "सुभानल्ला!"॥१॥
"भागो भागो दवडो दवडो" एक शध्द उठला॥
झोंप साखरी लागे कोणा कोणि बरळत सुटला॥२॥
डंका झडला ‘हुशार रहना कुच करना जल्दी’॥
परंतु मानी कोण अवेळीं चढाइची वर्दी॥३॥
घोडयावरचे जीन चढविलें बैलाच्या पाठी॥
हत्तीवर कंठाळि ओढि तो उंट तोफ मोठी॥४॥
राकट कडवे परंतु रडवे राउत ते सजले॥
शिगं फुंकतां अति त्वरेनें शिवमार्ग गेले॥५॥
वायूवेगां सारूनि मागें मागेल चमु धावे॥
खरोखरी त्या तीव्र गतीला कवीनिंही गावें॥६॥
भल्या पहाटे सैन्य म-हाठी गांठियले त्यांनीं॥
नंतर कुत्तरतोड लढाई करिति दळें दोनी॥७॥
मरे परी तिळ हटे न ऐशा चिकट म-हाठयांशी॥
मुसल्मान अति प्रेमें लढती करूनि शिकस्तीशी॥८॥
॥ चाल ॥ मावळे लोक बहु थोडे ॥ मावळे०॥
जिवाचे धडे करिती सौगडे॥
परि शत्रुसैन्य जोराचें। करि हल्ले अति निकराचें॥
जणुं तुफांन वावटळीचे ॥ढांसळवि गिरी आशेचे ॥
प्रळ्यकाळ हा गिळतो वाटे जणुं महाराष्ट्राशी ॥उदो०॥
८
झडकरि आपण महाराज ! या खिंडीतूनि जावे ॥
अपार शत्रूसेना ग्रासिल क्षण न य़ेथ रहावें ॥ १ ॥
मी धरतो हे नाक दाबुनि पावनखिंडिचें ॥
तोंवर जावें खुशाल घेउनि सैन्य मावळ्यांचे ॥ २ ॥
ठेवा निवडक कांहि मावळे माझ्य़ा पाठीशीं ॥
उभा रहातों असा इथे मी ठोंकूनी छातीशी ॥३॥
सुखरुप जोवरि असे शिवाजी तोंवरिं काळाला ॥
भीक न घालूं लाख रिपूंना दवडूं पातळा ॥४ ॥
असे निक्षुनी बोले बाजीप्रभु गहिवरला ॥
महिवर हा जणु भक्त मारुती संकटी अवतरला ॥५ ॥
आलिंगुनि बाजीस चालला शिव ढाळित असवें ॥
मनी म्हणे ती धन्य़ जननि ते धन्य़ तिचे कुसवें ॥६ ॥
कसा एकटा प्रभूवीर हा दई तोड अरिला ॥
म्हणूनि शंकूनी वरचेवर शिव फिरवी मानेला॥७ ॥
तलवारीनें ‘जा जा ’बाजी खुणवी फिरवि पट्टा ॥
राहिं न क्षण शिर नीट धडावर ज्य़ांस बसे रट्टा ॥८ ॥
॥चाल॥ विसरलो गोष्ट मुद्दय़ाची ॥विस० ॥
शिवरायाची ॥ प्रभू बाजीची ॥
बाजीस धरी शिव पोटीं.॥ हृदयांस आणिलें ओठी॥
भडभडून आलें पोटीं ॥ सांगितलिं एक हितगोष्टी ॥
ठोकीन तोफा पांच पोंचता रांगण किल्य़ासी ॥उदो० ॥
९
गडी मावळे मुठभर सारे तोडी खिंडीच्या॥
उभे राहूनी छाटिती सप सप तुकड्य़ा शत्रूच्य़ ॥१॥
गुं गुं भरभर सों सो सुटती दगड गोफणींचे ॥
बाणांचा सणसणांट पाडी ढीगार प्रेतांचे ॥२॥
चमचम चमकति तलवारीची भाल्य़ाची पाती ॥
शिरे कितीतरि चेंडुसारखी भरभर वर उडती ॥३
चहुकडे घनदाट चालले पाटची रक्तांचे॥
धारातीथी "खतम "जाहले वीर फाजलाचे ॥४॥
हत्ती बुडेसा चिखल जाहला रक्तामांसाचा ॥
युध्द नव्हे ! तो पसरे जबडा विश्र्वभक्षकांचा ॥५॥
तांडावरती उभा वीर प्रभु बाजी देशपांडे
समशेरीच्या फडक्य़ासारसा करि अरिचीं खाडें ॥६॥
पट्टा फिरवित उभा ठाकला काळ अविंधांचा॥
दाट पडे तट पाठीमागें मर्द मावळय़ांचा ॥७॥
हल्य़ावरती हल्ले चढती देती किती टकरा॥
परंतु उतरा बाजी खाली फाजलचा नखरा ॥८॥
॥चाल॥ नाहला उभा रक्तांनी॥ नाह०॥
किती जखमांनी॥ युध्दश्रमांनीं॥
मागे न पाय तिळ घेई॥ हल्यांची नित्य नवाई ॥
पट्याची अति चपळाई॥ ही शिवबाची पुण्याई॥
१०
उरता थोडे सैंन्य़ दणाणे धावे शिध्दीचे॥
शक्ती युक्ती हरली संपले प्रभाव बुध्दीचे ॥१॥
चढवी चिडुनी अखेरचा मग निकरांचा हल्ला॥
संधि साधुनी बमी बाजीप्रभू जखमी केला॥
बांधुनि जखमा तयार झाला वीर दुजो-याने ॥
हटे न तिळ जरि शिकस्त केली शिध्दी फाजलने ॥३॥
एक दोन ना बारा झाल्या जखमा बाजीला ॥
मान न त्याला परी लढे तो स्वामीकार्याला ॥४॥
शिवरायाची तोफ जोंवरी पडे न मम कानी ॥
तोंवरी आला काळ तरि त्या ठेचिन लाथांनि ॥५॥
जय हर जय हर बोलुनि चेतवि सर्व सौंगड्य़ांना ॥
तेही पठ्ठे कसून लढती त्य़जुनि देहभाना ॥६ ॥
तोफ ऐकुं म्हणुनी व्य़ाकुळ मनि बाजी ॥
पाच तास तो लढला परि नच हटला रणगाजी ॥७ ॥
उभा ठाकला पुढे काळ साक्षांत त्यांस खाया ॥
पंरतु मानी त्यांस न तिळ धरि चित्त प्रभूपाया ॥८ ॥
॥चाल॥ घोम धडडड धडडड ऐसा ॥धोम्०॥
ध्वनि तोफांचा । शिवरायाचा ॥
शेवटी पडे तो कानी ॥ जीवास धन्य तो मानी॥
जयशिव जयशिव हें म्हणूनि ॥ अंतिचा श्र्वास सोडुनि॥
धारातीर्थी मोक्ष मिळे प्रभु रणशुर बाजीशी ॥
सुरनर किन्नर गाउनि करती सुपुष्यवृष्टीशी ॥
११
बाजी पडतां सिद्धि धावला त्यास आलिंगाय ॥
फाजल महमद उडी घेउनी ये स्तवना गाया ॥ १ ॥
‘भले बहाद्दर भले बहाद्दर दुस्मन तूं दाना’ ॥
तलवारीनें वंदन करिता वांकवुनी माना ॥ २ ॥
बाजीला मग मुजरा केला अखेर सर्वानी ॥
मुसल्मानही रडले जरि ते फुगले गर्वानीं ॥ ३ ॥
सभोवतीं मग जमला मेळा मर्द मावळ्यांचा ॥
मुक्तकंठ तो शोक कुणी बा! वर्णावा त्यांच्या ॥ ४ ॥
सन्मानानें प्रत बाजीचें नेले शिवपायां ॥
रडे मुलापरि धायधाय शिवराय पडे ठायां ॥ ५ ॥
बळी दिला तूं तुझ्या जिवाचा केवळ मजसाठी ॥
राष्ट्रोन्नतिची जणू बसविली कोणशिला मोठी ॥ ६ ॥
ज्या भूमीवर रक्त सांडले या प्रभु वीराचें ॥
दर्शन घेतां गहिवरती नर अलोट धीराचे ॥ ७ ॥
बाजी गेला कीर्त करुनिया बखरी त्या गाती ॥
विसरे ज्या दिनि महाराष्ट्र त्या खाइल तें माती ॥ ८ ॥
आकाशीं जोवरी चमकती चंद्र सुर्य तारे ॥
गातिल शाहिर कवनांवरती कवन कंरुनि सारे ॥ ९॥
॥चाल॥ प्रभु बाजी देशपांडयाचा ॥प्रभु०॥
पवाडा पुरा। मोत्याचा तुरा ॥
वाहिल बाजीच्या पायीं ॥ त्याचीच सर्व पुण्याई ॥
ती प्रसन्न अंबाबाई ॥ म्हणुनी हे कवन मी गाई ॥
शाहिर केशव अखेर करितों मुजरा सर्वासी ॥ उदो०॥
पुस्तकातली प्रबोधनची जाहिरात
सामाजिक धार्मिक व राजकीय
स्वयंनिर्णयाची विचारक्रांती
प्रबोधन
मासिक नियमाने वाचल्यास होते असा महाराष्ट्राचा तीन वर्षाचा खास अनुभव
आहे. चवथे वर्ष सुरू झालें. वार्षिक वर्गणी ४ रूपये. कॉलेज, हायस्कूलचे विद्यार्थी व सार्वजनिक लायब्र-यांना सवलतीची वर्गणी रू.३. नमुन्याच्या अंकासाठी ४ आण्याची तिकिटें पाठवा.
प्रबोधन कचेरी
(ब) ३४५ सदाशिव पेठ, पुणें शहर.