पंडिता रमाबाई सरस्वती
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
पहिल्या आवृत्तीविषयी
पण्डिता रमाबाई सरस्वती
प्रबोधनकार के. सी. ठाकरे
मुंबई २८
प्रथमावृत्तिः १९५०
(सर्व हक्क लेखकाचे स्वाधीन)
मुद्रक : दि. अ. देसाई, सर्वोदय प्रिण्टर्स अण्ड पब्लिशर्स, मुंबई
प्रकाशक : दि. अ. देसाई, रामकृष्ण बुक डेपो, गिरगांव, मुंबई
शंभर वर्षापूर्वी
“सुधारकांचे रक्त पडे, तेव्हा सुधारणा घडे”
महाराष्ट्रात आज मुलांच्या बरोबरीने मुलींचेहि शिक्षण सर्रास सारखे चालू आहे. हजारो मुली साक्षर सुविद्य आणि पदवीधर झाल्या आहेत, नित्य होत आहेत. पुरुषांच्या बरोबरीने समाज-राजकारणांत त्या श्रमत झगडत आहेत. पण शंभर वर्षापूर्वी स्त्रियाना साक्षर करणे महापाप समजण्यात येत असे, हे वाचून ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.
त्या काळात मुलगी आठ वर्षाची झाली रे झाली का तिचा विवाह केलाच पाहिजे, असा संभावित रिवाज होता. केला नाही तर आईबापाना नि सग्यासोयऱ्याना समाजात उजळ माथ्याने वावरण्याची पंचाअीत. आठ वर्षाच्या मुलीचा नवरा किती वयाचा असावा, याचाहि धरबंद नसे. चाळीस वर्षांचा बाप्याहि चालायचा. तशात दुर्दैवाने एकादी बाला विधवा झाली तर तिचे सासरी माहेरी भयंकर हालहाल व्हायचे. तिचा केशकलाप न्हाव्याकडून भादरून विरूप करायचे, उपाशी ठेवायचे, मारहाण करायचे, भाजायचे लासायचे. "अवदसा, पांढऱ्या पायाची, हिने नवन्याला खाल्ला, राक्षसीण आहे ही“ असे शिव्याशाप त्या बिचारीला दररोज खावे लागत असत. कधिकधि तिला घराबाहेरहि हाकलून देण्यात येत असे. शिक्षण नाही, कसली विद्या नाही, समाजात कोठे थारा नाही, काय करायचे तिने? कोणाच्या घरी आचारीण, मोलकरीण म्हणून मरण येइतोंवर जगावे किंवा तळीविहिरीचा ठांव घ्यावा.
५० वर्षापूर्वीपर्यंत संभावित म्हणविणाऱ्या पांढरपेशा हिंदु जमातींत अशी स्त्रियांची अवस्था होती बरे! ती समूळ पालटण्यासाठी, `स्त्रियाना शिक्षण दिलेच पाहिजे आणि बाल किंवा तरुण विधवांचे असले हाल कायमचे नाहीसे झालेच पाहिजेत` या निर्धाराने समाजाची निंदा छळ उपहास सोसून ज्या अनेक सुधारकानी धडाडीचे प्रयत्न केले, त्यांत पंडिता रमाबाई अग्रेसर अबलोद्धारक म्हणून महाराष्ट्राच्या अर्वाचीन इतिहासात चिरंजीव झाल्या आहेत. अनाथ अपंगांच्या सर्वांगीण उद्धारासाठी त्यानी केलेली चळवळ आणि मिळविलेले ठळक यश, यांची चित्त थरारून सोडणारी कहाणी आता वाचा नि ऐका.
प्रकरण १ ले
शुद्ध बीजापोटीं
केल्यानें देशाटन पंडितमैत्री सर्भेत संचार ।
शास्त्रग्रंथविलोकन मनुजा चातूर्य येतसे फार ॥
रमाबाईंचे वडील अनंतशास्त्री डोंगरे. चित्पावन कोकणस्थ ब्राम्हण. जन्म सन १७८६. दक्षिण कानडा जिल्ह्यात घाटाच्या पायथ्याशी मंगळूर म्हणजे माळहेरंबी येथले रहाणारे. घराणे मोठे पण कर्जबाजारी. त्याला कर्जमुक्त करण्यासाठी आपण लवकर लवकर विद्याध्ययन केले पाहिजे, या हेतूने अनंत बालपणीच घर सोडून बाहेर पडला. सहा वर्षेपर्यंत त्याने अनेक नामांकीत गुरूजवळ शास्त्राध्ययनाच्या संथा घेतल्या. मोठमोठ्या ज्ञानवंतांच्या संगतीने आचार विचारांची नैतिक कमावणी होत गेली. शृंगेरी मठाचे एक शंकराचार्य अनंताचे गुरुबंधू होते.
विद्येच्या बाबतीत अनंत अल्पसंतुष्ट नव्हता. विशेष ज्ञानाच्या प्राप्तीसाठी श्रीमंत पेशव्यांच्या पुणे राजधानीत गेला. दुसरे बाजीराव पेशवे यांची पत्नी सौ. वाराणशीबाई याना संस्कृत शिकवण्यासाठी नेमलेले रामचंद्रशास्त्री साठे यांची शागीर्दी अनंताने पत्करली. वरचेवर त्याला शनिवार वाड्यात जाण्यायेण्याचे योग लाभले. वाराणशीबाई आपल्या मधुर आणि शुद्ध वाणीने हजारो संस्कृत श्लोक अस्खलित घडघडा पाठ म्हणताना पाहून ऐकून अनंतास मोठे कौतुक वाटले. येथेच प्रथम त्याला स्त्रीशिक्षणाचे महत्व पटले. मीही आपल्या पत्नीला अशीच शिकवीन, ही त्याने मनोमन प्रतिज्ञा केली. बाजीरावाची ब्रह्मावर्ताला रवानगी झाल्यावर साठेशास्त्री त्यांच्याबरोबर निघून गेले. म्हणून म्हैसूर दरबारचे सभापंडित रामशेषशास्त्री द्रवीड यांच्यापाशी पुढील अध्ययनासाठी अनंताने तिकडे प्रयाण केले.
म्हैसूरला त्याने दहा वर्षे काढली. विद्वान शास्त्री म्हणून त्याचा पुष्कळ गौरव झाला. संपत्ति पालखी चवरीचा मान मिळाला. घरी माळहेरंबीला परत येऊन त्याने कर्जवाम फेडले आणि वडिलाना बरोबर घेऊन सहकुटुंब अनंतशास्त्री काशीयात्रेला गेले. त्या काळची काशीयात्रा म्हणजे एक मोठे श्रम साहसाचे दिव्यच असे. शीरसलामत घरी परत येईल तो भाग्यवान! यांची बायको वारली. तिला त्यानी प्रतिज्ञेप्रमाणे थोडेफार संस्कृत गुपचूप शिकवले होते. काशीयात्रा पुरी करून वडिलांची घरी परत रवानगी केल्यावर, अनंतशास्त्री काशी येथेच आणखी शास्त्राध्ययन करण्यासाठी राहिले. तत्वज्ञानाचा विशेष अभ्यास करण्यासाठी काश्मीरलाहि गेले. तेथल्या महाराजानी दान दक्षणा मानपानाने त्यांची पुष्कळ संभावना केली. नेपाळच्या महाराजानी सुद्धा या दक्षिणी पंडिताचा चांगला सत्कार केला.
विवाहाचा अवचित योग
नेपाळाहून गुजराथ दक्षिण प्रांतांचा प्रवास करीत परत येत असतना पैठण मुक्कामी वाईचे माधवराव अभ्यंकर या गृहस्थाची गाठ पडली. संसाराचे गाडे मनासारखे नीट जुळले नाही म्हणजे पूर्वीचे लोक वैतागाने काशीयात्रेस निघून जात असत. अभ्यंकर हे असेच वैतागून आपली बायको आणि अंबाबाई नांवाची अवघी नऊ वर्षाची एक कन्या बरोबर घेऊन, रस्त्याने साष्टांग नमस्कार घालीत घालीत काशीला चालले होते. अनंतशास्त्र्यांचे वय या वेळी ४४ वर्षांचे होते, तरी ते निरोगी सशक्त नि तेजस्वी पाहून, माधव अभ्यंकरानी त्याना अंबाबाईचे शास्त्रोक्त पाणीदान करून, ती नवरा बायको पुढे चालती झाली.
खबरदार बायकोला शिकवशील तर
घरी परत येताच अनंतशास्त्र्यानी आपल्या अल्पवयी लक्ष्मीबाई पत्नीला संस्कृत शिकवण्याचा उपक्रम चालू केला. त्यांचे अध्ययन जरी जुन्या धाटणीचे झालेले होते तरी देशाटन, पंडितमैत्री, ठिकठिकाणच्या समाजस्थितीचे अवलोकन यामुळे अनंतशास्त्री कडवे विवेकवादी, चिकित्सक आणि पुरोगामी वळणाचे बनले होते. बायकोला संस्कृत शिकवण्याचा हा सुधारकी बाटगेपणा घरातल्या नि आजूबाजूच्या लोकाना मुळीच आवडला नाही. “स्त्रियांना कधी कोणी शिकवतात काय? शिकून त्या पुढे काय दिवे लावणार `अनृतं साहसं माया` त्या! छे, आम्हाला हे साफ परवडणार नाही. बायकोला संस्कृत शिकवायचे म्हणजे काय? संस्कृत म्हणजे देववाणी! वेदवाणी. स्त्रियाना नि शूद्राना ती उच्चारण्याचा अधिकारच नाही.” असा सगळ्या गावात गलबला माजला. अशा गलबल्याला दाद देण्याइतके अनंतशास्त्री कच्च्या दिलाचे नव्हते. स्त्रियानी सर्व प्रकारचे शिक्षण घेऊन पुरुषांप्रमाणे विद्यावान प्रज्ञावान झालेच पाहिजे. प्राचीन काळी अशा स्त्रीशिक्षणाचा प्रघात होताच होता. या सत्यशोधनाला ते धिटाईने चिकटून राहिले.
याचे नांव पुरुषोत्तम!
स्वतःचे घर आणि सारा गाव बायकोच्या शिक्षणाला विरोध करतो असे दिसताच, अनंतशास्त्री आपल्या अल्पवयी बायकोला बरोबर घेऊन एका वस्त्रानिशी वनवासाला निघाले. याला म्हणतात कडवी तत्वनिष्ठा! सत्याचा शोध बिनचूक झाला, तत्व मनाला खासखूस पटले का त्याच्या सिद्धीसाठी सर्वस्वावर निखारे ठेवायलाहि जो तयार होतो, तोच पुरुषोत्तम, तोच खरा पंडित आणि तोच मानवतेचा खरा उद्धारक. जगातल्या सगळ्या सुधारणा अशाच तत्वनि सत्यशोधकानी घडवून आणलेल्या आहेत.
अनंतशास्त्री बायकोला घेऊन जे निपाले ते थेट तुंगा, भद्दा नि कृष्णा नद्यांचा उगम झाला आहे अशा गंगामूल अरण्यात गेले. जिकडे तिकडे दाट भयंकर अरण्य. लांडगे, कोल्ही, वाघ, अस्वलांचा सुळसुळाट. माणूस तिकडे चुकूनसुद्धा फिरकायचे नाही. अशा निर्जन ठिकाणी ठाण मांडले. वस्तीच्या पहिल्याच रात्रीचा अनुभव लक्ष्मीबाई सांगत असत. “त्या दिवशी रात्री डोके टेकायला आम्हाला निवाऱ्याची जागा तर नव्हतीच, पण आंग टाकायलाही गवत नव्हते. चक्क डोंगराळ जमिनीवर डोके टेकून आम्ही राहिलो. चालण्याच्या थकव्याने कसाबसा डोळा लागतो न लागतो तोच अगदी जवळपास वाघाची डरकाळी ऐकू आली. माझ्या काळजात धस्स झाले.“
उद्योगाने जंगलाचे मंगल
शाबास त्या अनंतशास्त्र्याची! आपल्या बालवयी पत्नीला धीर दिलासा देऊन, त्या भयाण जंगलात झाडी तोडून निवाऱ्याला जागा तयार केली. लाकूडफाटा जमवून एक झोपडी बांधली. जंगली फळांमुळांवर आहार चालवला. लक्ष्मीबाईला संस्कृताचे पाठ देऊन तिला विद्यानंदाची गोडी लावली. सुरुवातीला तिला हे जंगली जीवन कंटाळवाणे नि एकलकोंडे गेले खरे, पण दोघेहि धाडसी नि उद्योगी असल्यामुळे, तेथे त्यानी थोड्याच दिवसांत फळबाग नि शेतवाडी तयार करून संसाराची मांडणी केली. लक्ष्मीबाईचे संस्कृताचे अध्ययन सारखे वाढत चालले.
विद्वान सर्वत्र पूज्यते
महापंडित म्हणून अनंतशास्त्र्यांचा नावलौकीक पूर्वीच सगळीकडे फैलावलेला असल्यामुळे, त्यांची शास्त्रशिक्षणाची दीक्षा घेण्यासाठी आतुरलेल्या शेकडो तरुणांच्या पालकानी त्यांचा शोध चालवला. शास्त्रीबोवा गंगामूल अरण्यात आश्रम बांधून आहेत, असे कळताच शेकडो शिष्य रस्ता काढीत काढीत तेथे जमा झाले. हळूहळू त्या ठिकाणाला प्राचीन याज्ञवल्क्य ऋषींच्या आश्रमाचे मनोहर रूप प्राप्त झाले. शिष्यानीही आपापल्या झोपड्या उभ्या केल्या. आजूबाजूला फळांचे सुंदर बगिचे निर्माण झाले. धान्यांची शेते डोलू लागली. रात्रंदिवस उद्योगाच्या जोडीने संस्कृत शास्त्रांच्या पारायणांचे घोषध्वनि अखंड चालले आहेत. कोणी फळाफुलांची, तर कोणी
शेतवाडीची मशागत करताहेत. आहारासाठी धान्य फळांची जमवाजमव नि टिपण निवड करताहेत. जी जागा पूर्वी निर्जन होती, तीच आता आश्रमीय वैभवाने गजबजून राहिली. सातआठ माणसांचे कुटुंब, पांच पन्नास विद्यार्थी, शे दोनशे गुरेढोरे इतक्यांचा चरितार्थ चालेल एवढे कृषिक्षेत्र नि ज्ञानक्षेत्र सिद्ध झाले. लक्ष्मीबाईंनी संस्कृताचे अध्ययन पुष्कळच वाढविले असल्यामुळे, शास्त्रीबोवा परगावी जात तेव्हा त्याच विद्यार्थ्यांना पुढचे पाठ देत असत. गंगामूल आश्रमात शास्त्रीबोवा तेरा वर्षे राहिले. त्याना एकंदर सहा मुले झाली. पैकी कृष्णाबाई, श्रीनिवास आणि रमाबाई ही तीनच मुले जगली.
रमाबाईच्या एक चरित्रलेखिका मिसेस पॉल अप्पासामी म्हणतात, “जी लक्ष्मीबाई प्रथम येथे आली तेव्हा भितरी नि बुजट मुलगी होती. आणि अरण्यांतील हिंस्र पशूंच्या आरोळ्या कानी पडू नयेत म्हणून डोक्यावरून पदर गुंडाळून घेत असे, तिनेच आता खरे चित्पावनी पाणी प्रगट करून आपला वाढता संसार आणि शिष्यांचा नि यात्रेकरूंचा परिवार यांचा गाडा कर्त्या सवरत्या गृहिणीप्रमाणे हाकिला. मुलेबाळे झाल्यावर त्याना पवित्र संस्कृत भाषा शिकवण्याचे कार्य त्यानी पार पाडले. मोठमोठ्या संस्था चालविण्याची पात्रता नि कर्तबगारी जी पुढे रमाबाईंनी मोठ्या प्रमाणात लोकांच्या निदर्शनाला आणली, तिचे बीज गंगामूल अरण्यातल्या त्यांच्या मातोश्रीच्या या आश्रमीय धडाडीनेच त्यांच्यात पेरले गेले.“
चारशे पंडिताना वादात चीत केले
महाविद्वान नि साधू असा अनंतशास्त्र्यांचा लौकीक आसेतू दक्षिण प्रांतात फैलावला. अनेक जुन्या सामाजिक रूढी, रीतीभाती, धर्मकल्पना यावर अनंतशास्त्री हिरिरीने हल्ला चढवीत. स्त्रियाना शिक्षण देण्यात तर त्यानी प्रत्यक्ष आचरणाने कमालीचा पुढाकार घेतलाच होता. मुलींचे विवाह अल्पवयात मुळीच न करता, त्या शिकून सवरून चांगल्या प्रौढ झाल्यावर त्यांनी स्वतःच्या पसंतीने वरशोधन करावें इत्यादि मतामुळे, त्यांच्या पांडित्याच्या लौकिकाबरोबरच ठिकठिकाणच्या शास्त्रीमंडळांत मोठा गवगवा चालू झाला. शास्त्रीबोवांची असली सुधारकी मते त्यांचे विद्यार्थी पचनी पाडणार आणि ती सगळीकडे फैलावणार! जुन्या मतांच्या लोकांना हा मोठाच धोका वाटत होता.
अखेर शास्त्रीमंडळीनी शंकराचार्यांपुढे अनंतशास्त्र्याविरुद्ध फिर्याद मांडली. शहरोशहरीचे चारशे पट्टीचे पंडित एका बाजूला आणि समोर एकले अनंतशास्त्री त्याना जाब द्यायला, असा मुकाबला उभा राहिला. जाब जबाबांचा लेखी वाद दोन महिनेपर्यंत दररोज अखंड चालू होता. अनंतशास्त्र्यानी वेद, उपनिषदे पुराणे स्मृत्यादि ग्रंथांतून हजारों दाखले सभेपुढे मांडून आपल्या पुरोगामी मतांचे समर्थन केले आणि शंकराचार्यासकट सर्व शास्त्रीमंडळाला त्यांचे आरोप मागे घ्यायला लावले. या शास्त्रनिर्णयावर त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता. शास्त्राच्या आधाराने अनंतशास्त्री या वादात जरी विजय झाले तरी यांच्या पुरोगामी विचार-उच्चार-आचारांकडे पहाण्याची शास्त्रीलोकांची कोती नजर निवळली नाही ती नाहीच. त्यानी अनंतशास्त्र्याना
बहिष्कृतासारखेच वागविले.
वाढत्या संसाराच्या वाढत्या भानगडी
आश्रमाचा पसारा सारखा वाढत गेला. स्वताचा संसार, शिष्य मंडळी यांचे पालन पोषण शिक्षण चालू असतानाच, काशी ते रामेश्वर भटकंती करणाऱ्या यात्रेकरूंच्या टोळ्याहि आश्रमाच्या बिन्हाडी आसऱ्याला येऊ जाऊ लागल्या. अनंतशास्त्री दिलाने दिलदार. तशाच लक्ष्मीबाईहि. दोघेहि हाताची सरळ नि सढळ. आल्या गेल्याचे कोठे काही उणे पडू यायचे नाही. स्वता अर्धपोटी राहून पहिपाहुण्यांची सरबरायी राखायची. आपला हाथ नि जगन्नाथ! हवे त्याने हवे ते मागावे आणि या नवरा बायकोने मुकाट्याने द्यावे.
तीर्थयात्रा म्हणजे थट्टा नव्हे!
मुलगी कृष्णाबाई १० वर्षाची झाली. तिचे लग्न करून टाका. घोडनवरी किती वाढवणार? असा नातेवाईकांचा, आश्रित फुकटखाऊंचा नि भिक्षुकांचा तगादा लागला. ती शिकून चांगली प्रौढ होईपर्यंत मी तिचा विवाह करणार नाही, असा शास्त्रीबोवांचा आग्रह. पण अखेर लक्ष्मीबाईच्या हट्टासाठी कृष्णाबाईचा विवाह करून त्यानी घरात घरजावई आणला. हे जावईबोवा निघाले छंगीफंगी! एक वर्षाच्या आतच त्याने सासऱ्याच्या संपत्तीची नि शेतवाडीची मनस्वी लूट नि अफरातफर केली. आश्रमातल्या मंडळीची उपासमार होऊ लागली. शिष्य भराभर निघून गेले. आश्रम उजाड पडला.
प्रकरण २ रे
कर्माची खटखट
देणेदारांचे देणे फेडून लक्ष्मीबाई, मुलगी कृष्णाबाई, मुलगा श्रीनिवास आणि अवघ्या सहा महिन्यांची रमा बरोबर घेऊन अनंतशास्त्री तीर्थयात्रा करायला बाहेर पडले. त्या काळच्या तीर्थयात्रा म्हणजे एक प्राणांतिक वनवासच असे. आजकालच्या आगगाडी, मोटारी, तारायंत्राच्या युगातल्या मंडळीना त्याची कल्पना होणेच कठीण. रस्ते सडका केवळ पायदळीच्या. सगळा प्रवास अनवाणी पायानी करायचा. वहानांचा उपयोग करायचा नाही. काही तुरळक ठिकाणी अन्नछत्रे असली तरी तेथे अन्न घ्यायचे नाही. शास्त्रीबोवानी सहा महिन्यांच्या रमा छोकरीला एका टोपलीत बसवून मजुराच्या डोकीवर दिली. बाकी सर्व मंडळी पायी कूच दरकूच करीत मद्रास प्रांताकडे निघाली.
एकाद्या मुक्कामाच्या क्षेत्रात धर्मशाळेत किंवा गावाबाहेर झाडाखाली छावणी द्यायची. स्नान संध्या आन्हिक उरकून देवळात किंवा नदीच्या तटावर संस्कृत पोथी उघडून पुराण सांगायचे. पोथीपुढे भाविक श्रोते चिमूट मुठी तांदूळ किंवा दिडकी दमडी टाकतील तेवढ्यावर निर्वाह करायचा आणि
यातूनच क्षेत्रस्थ उपाध्ये गोसावी साधूसंताना दक्षणा दाने द्यायची. एका जागी असे काही दिवस काढल्यावर पुढे प्रयाण करायचे, असा क्रम चालू झाला. ज्या अनंतशास्त्र्याच्या गंगामूल आश्रमात शेकडो शिष्य नि पांथस्थ यात्रेकरू इच्छा-भोजनाची चंगळ उडवीत होते, त्या बिचाऱ्यावर आज चव्हाट्यावर
पुराणे सांगून कुटुंबाचे पोट भरण्याचा प्रसंग आला. पुष्कळ वेळा त्यांची उपासमारही व्हायची. पण हे सारे ताप सहन करून ही मंडळी कट्टर धर्मनिष्ठा आणि ईश्वरोपासना, तीर्थस्नाने आणि दाने करीत अखंड प्रवास करीत राहिली.
रमाबाईचे वनवासातले शिक्षण
इसवी सन १८५८ पासून तो १८७८ पर्यंत म्हणजे तब्बल २० वर्षे कुटुंबाचा यात्रेचा वनवास चालू होता. बिचारी बाल रमा या वनवासांतच वाढत होती. शास्त्रीबोवा नि लक्ष्मीबाई अशाहि वनवासात मुलांच्या शिक्षणाविषयी अत्यंत जागरूक राहून त्यांचे बौद्धिक संवर्धन करीत होते. रमा सात वर्षाची होताच तिला संस्कृत शिकवायला प्रारंभ केला. आईने रोज पहाटे ४ वाजता उठावे आणि आपल्या चिमुकल्या रमेला संस्कृत, भागवत, पुराण, गीता व्याकरण नि अमरकोशाचे पाठ यावे. ते चांगले घोकवून घ्यावे. रमाबाई बारा वर्षाची झाली तेव्हा तिला भागवत पुराणाचे अठरा हजार संस्कृत श्लोक अस्खलित पाठ म्हणता येत असत. शिवाय गीता, स्तोत्रे नि कोश तर तोंडपाठ होतेच.
या वनवासी डोंगरे कुटुंबाने २० वर्षात हज्जारो मैलांचा पायी प्रवास करून सेतुबंध रामेश्वरापासून तो उत्तरेकडे थेट काशी काश्मीर हिमालयापर्यन्तची शेकडो तीर्थक्षेत्रे पाहिली. काही ठिकाणी त्याना तुरळक सज्जन आदरातिथ्य लाभायचे तर पुष्कळ ठिकाणी हातावर मिळवून तळहातावर खाण्याचे आणि पोट बांधून उपाशी झोपण्याचे प्रसंग मुबलक आले.
तीर्थयात्रा कशासाठी? तर तीर्थस्नाने केल्याने, भटाभिक्षुकाना नि साधु गोसाव्याना दाने दक्षणा भोजने दिल्याने आणि जागोजागच्या देव देवतांचे दर्शन घेतल्याने सात जन्मांची पातके जळून भस्म होतात, असे पुराण ग्रंथांत आवर्जून लिहिले आहे, या श्रद्धेच्या समाधानासाठी! एवढा मोठा पढिक दशग्रंथी जाडा विद्वान शास्त्री, विवेकवादी नि चिकित्सक, पण तोहि या पौराणिक भुलथापांना बळी पडला! मग इतर आड्माडूंची अवस्था काय होत असेल? अखेर, काशी केली, वाराणशी केली, कर्माची खटखट नाही गेली, असाच बिचाऱ्याना कटु अनुभव आला.
मद्राशी दुष्काळात कुटुंबाची आहुती
उत्तर हिंदुस्तानातली सर्व तीर्थक्षेत्रे पाहून झाल्यावर, डोंगरे कुटुंब दक्षिणेकडे परतले असता, सन १८७६-७७ च्या मद्रास इलाख्यात भडकलेल्या दुष्काळाच्या तडाक्यात सापडले. एकाद्या भयंकर रोगाच्या साथीसारखे हजारो लोक भुकेला बळी पडून धडाधड मरत होते. यावेळी रमाबाई चांगली १८ वर्षाची तरुणी होती. त्या भयंकर दुष्काळाच्या आठवणी त्यांनी लिहून ठेवल्या आहेत. त्या वाचल्या म्हणजे आजहि आंगावर काटा उभा रहातो. त्या सांगतात
“.... १८७६-७७ साली तो दुष्काळ कळसाला पोचला होता तरी त्याची भयंकर चिन्हे दोन तीन वर्षे आधी जाणवतच होती. आईवडिलानी आम्हाला शास्त्रपारंगत खूप केले असले, तरी बाहेरच्या जगाची आणि लोकव्यवहाराची फारशी अटकळ आम्हाला नव्हतीच. दुष्काळामुळे चहूकडे लोकांचे काय हाल होत होते, कोणत्या अवस्थेत ते जगत होते नि मरत होते याची स्पष्ट कल्पना असल्याचे मला आठवत नाही. पण प्रत्यक्ष आमच्याच कुटुंबातल्या मंडळीवर आलेले अन्नान दशेचे प्रसंग आणि आम्ही भोगलेल्या विपत्ति मात्र माझ्या चांगल्या स्मरणात आहेत........ आमच्या कुटुंबाने चांगले दिवस पाहिलेले होते. बाबांचा स्वतांचा जमीनजुमला होता. विद्वतेवर त्यानी पुष्कळ संपत्तीहि मिळवलेली होती. ती आली तशी गेली! या दुष्काळाच्या प्रसंगात त्यांची प्रकृति सारखी संगत गेली आणि शेवटी त्यांचे डोळे गेले. मग मात्र आमची सगळ्यांची पाचावर धारण बसली. राजमान्य लोकमान्य पंडिताची मुले आम्ही. तशात पांढरपेशा ब्राम्हण वर्गातली पोट भरण्यासाठी मोलमजूरीहि आम्हाला करता येई ना. धर्मशास्त्राप्रमाणे काटेकोर सचोटीने कसे वागावे, सोवळेओवळे कसे पाळावे, उद्यापने तीर्थस्नाने कोणत्या मंत्रानी नि तंत्रानी करावी, कोणकोणते उपास करावे, इतके आमचे शास्त्राध्ययन झालेले असले, तरी वडील मातोश्री बरोबर आपली खताचीहि अन्नान्नदशा झाली असता मानपान नि सामाजीक इभ्रत गुंडाळून ठेऊन, प्राण वाचविण्यासाठि पडेल तो हलकासलका उद्योगधंदा कसा करावा, हे ज्ञान आम्हास नव्हते. बरे करावा तर आमचा उच्च वर्णत्वाचा, विद्वत्तेचा नि श्रेष्ठ पणाचा अभिमान आडवा यायचा! शास्त्रे उदंड शिकलो पण व्यवहाराची नि आमची गाठच पडलेली नव्हती. देव देवता आज ना उद्या आमच्यावर सोन्याचा वर्षाव करतील, आमच्या हाल अपेष्टांचे नि दैन्याचे पांग फेडतील, म्हणून स्वता अर्धपोटी किंवा चक्क उपाशी राहून ब्राम्हणांच्या थाळ्या दक्षणेने भराव्या, ईश्वराचा राग शमवण्यासाठी त्याची आराधना करावी, नदी तीर्थात बुचकळ्या माराव्या, तासनतास गळ्याइतक्या पाण्यात उभे राहून मंत्रोच्चार करावे, लाकूड दगड धातूंच्या मूर्तीपुढे कपाळे घासून त्याना घट्टे पाडावे, यापेक्षा प्राण वांचवण्याची कोणतीच व्यावहारीक कला किंवा अक्कल आम्हाला उमगे ना. माझा भाऊ श्रीनिवास एकवीस वर्षाचा तरणाबांड होता. पण महिनेच्या महिने उपासतापास करून त्याने आपल्या बांधेसूद पीळदार शरिराची माती करून घेतली होती. जवळ होते नव्हते त्या सगळ्यांची वाट लागली. अखेर, उपासमारीने मरण यायचे तेवढे शिल्लक उरले. अरेरे, केवढा तो घोर प्रसंग! काय ते आमचे दैन्य आणि किती लाजीरवाणी ती परिस्थिति!”
‘मुली, जन्मभर ईश्वरसेवा कर’
व्यंकटगिरीच्या शिखरावर असलेल्या तिरुपति क्षेत्रात असताना या घोर प्रसंगात ही मंडळी सांपडली. माणूस माणसाला विचारी ना आणि देवहि धावण्याला धावे ना! आजवर केली ती तीर्थयात्रा नि देवदेवतार्चन वायाच गेले म्हणायचे? आपल्याच लोकात दारिद्र्याच्या लज्जेने कसेबसे जगण्यापेक्षा, रानावनात जाऊन मुकाट्याने मेलेले पत्करले, असा कडेलोटाचा विचार करून, डोंगरे कुटुंब जिवावर उदार होऊन निर्जन अरण्यात घुसले. अहोरात्र अकरा दिवस पायपिटी. झाडपाला खावा नि पोटाची आग शमवावी. उपासमारीने कोणाचे पाऊलहि धड उचले ना. अखेर शास्त्रीबोवांचा वाटेतच लोळागोळा झाला. देवाला हाका मारायची सोयच नाही आणि देव तर हात धुऊनच मागे लागलेले! निर्जन अरण्यात माणूस तरी कोठचे आढळणार? मानी अनंतशास्त्र्याना कुटुंबाचे होत असलेले हाल पहावेनासे झाले. त्यानी जिवंत जलसमाधी घेण्याचा निश्चय
केला. एकेकाला जवळ बोलावून ते अखेरचा निरोप घेऊ लागले, रमाबाई सगळ्यात धाकटी. शेवटी तिला त्यानी जवळ घेतली, तो प्रसंग रमाबाईच्या शब्दातच वाचा.
“... बाबांची दृष्टि गेलेली. माझा चेहरा त्याना कशाने दिसणार? त्यानी मला पोटाशी घट्ट धरले. माझ्या डोक्यावरून नि गालावरून प्रेमाने हात फिरविला. डोळ्यांतून घळघळा पाणी वहात होते. त्यांचा कण्ठ अगदी भरून आला होता. शब्दहि नीट उमटत नव्हता. ते म्हणाले, ‘बाळे, तुझ्यावरचे माझे प्रेम आणि सन्मार्गाने चालण्याचे मी तुला लावलेले वळण तू कधी विसरू नकोस बरं. नीतीच्या मार्गावरून चळू ढळू नकोस. पोरी, तू जगलीस वाचलीस तर सदाचरणात आयुष्य घालव आणि जन्मभर ईश्वरसेवा करण्यास चुकू नकोस. मुली तू माझी सर्वात धाकटी नि सर्वात आवडती मुलगी आहेस, हे लक्षात ठेव. तुला मी देवाच्या स्वाधीन करतो. तू त्याचीच कन्या, अखंड त्याची सेवा नि भक्ति कर.”
पित्याच्या या उपदेशाचा तरूण रमाबाईच्या हृदयावर जो खोल ठसा उमटला तोच तिच्या भावी आयुष्यातील पंचखंडमान्य लोकोत्तर कर्तबगारीला अजरामर ठरला.
संकटांच्या कहराने घेतलेले बळी
वडलांचा जलसमाधीचा निश्चय पाहून श्रीनिवास उफाळून उठला. ‘माझ्या देखत माझ्या जन्मदात्यानी अन्नान्न करून प्राण सोडावे? धिक्कार मला नि माझ्या तारुण्याला! झक मारतो तो जात्यभिमान आणि जळो तो कोरडा अभिमान! माझ्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी वाटेल तो हलका सलका धंदाहि करायला मी तयार आहे. चला, आपण सारे एकाद्या खेड्यात जाऊ. बाबाना मी आपल्या खांद्यावर घेऊन चालतो. मोलमजूरी करीन, पण बाबा, जलसमाधीचा हा हट्ट सोडून द्या. श्रीनिवासाच्या आणि माझ्या आईच्या आग्रहाने जलसमाधीचा प्रसंग एकदाचा टळला.’
अरण्य सोडून मंडळी खेडाकडे निघाली. वाटेत शास्त्रीबोवांची प्रकृती बिघडली. एका खेडयात येताच तहान भुकेच्या वेदनानी त्यानी डोळे पांढरे केले. “मुलानो, मला थोडे साखरपाणी द्या रे” ते म्हणाले. आसपास झऱ्यातले पाणी तोंडात घालता येईल, पण साखर कुठून आणणार! “साखर पाणी द्या रे”. काळीज कापीत गेले ते शब्द सगळ्यांच्या! जेमतेम पाणी घातले तोंडात आणि ते बेशुद्ध पडले ते पडलेच. तिसऱ्या दिवशी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.
ज्ञान नि व्यवहाराची फारकत
गावचा एकहि माणूस ढुंकून पाही ना. अखेर एका ब्राम्हणाला दया आली. त्याने मजूर आणवून दूर नदीच्या काठावर एक खड्डा खोदवला. गावचे लोक वाळीत टाकतील म्हणून तो दूरदूरच राहिला. श्रीनिवास कृष्णाबाई आणि रमाबाई या तिघानी बापाचे प्रेत काठीला बांधून खांद्यावर वाहून दोन मैल नेले आणि शेवटले संस्कार केले. थोडयाच दिवसांत मातोश्री लक्ष्मीबाईचा असाच अंत झाला. पाठोपाठ बहीण कृष्णाबाई पटकीच्या आजाराने मरण पावली. श्रीनिवास आणि रमाबाई भरल्या जगात उघडी पडली.
प्रकरण ३ रे
वनवास आणि जनवास
आई बाप नि बहीण अन्न अन्न पाणीपाणी करून मेल्यावर, श्रीनिवास आणि रमाबाई यांची अवस्था १३ व्या शतकातल्या अनाथ ज्ञानेश्वर - भावंडा सारखीच झाली. या वेळी रमाबाई १८ वर्षांची नि श्रीनिवास २० वर्षांचा होता. दोघांचेही संस्कृत भाषेचं, भागवत, पुराण, भगवद्गीता, व्याकरणादि अध्ययन उत्कृष्ट झालेले होते. संस्कृत भाषेत तासन्तास अस्खलित संभाषण वचन करण्याचे रमाबाईचे प्राविण्य कौतुकास्पद होते. पण जगाच्या व्यवहारात वागावे कसे आणि पोट भरावे कसे, याचे ज्ञान मात्र कोणालाहि नव्हते. असणार कसे? सारा जन्मच वनवासाच्या पायपिटीत आणि क्षेत्रोपाध्यांच्या मिक्षुकशाही जंजाळात गेलेला!
बालवयापासून ती वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत आसेतु हिमाचल तीर्थ यात्रेची हजारो मैल पायपिटी सारखी नशिबाला लागलेली. ठिकठिकाणी पाहिलेले देखावे, साधू, गोसावी, क्षेत्रस्थ भटभिक्षुकांचा लुटारूपणा, व्यसने अत्याचार, देवासाठी आईबापानी केलेले निर्जळी उपासतापास, तीर्थस्नाने, स्वतः उपाशी राहून भिक्षुक गोसाव्याना उदारपणाने दिलेली दक्षणा नि भोजने, अखेर प्राप्त झालेली अन्नान्नदशा आणि तिने घेतलेले आईबाप बहिणीचे निष्ठूर बळी, या सर्व प्रकारांचे मात्र रमाबाईच्या
चरेत्रावर नि चारित्र्यावर इतके खोल परिणाम झाले की पुढचे तिचे आयुष्य आणि कर्तबगारी त्यानीच भरपूर थरारली आणि भरारली.
वनवासाशिवाय गत्यंतरच नाही
जवळ फुटकी कवडी नाही, पोटात अन्नाचा घास नाही, हातपाय थकलेले, जागोजागचा समाजहि दाद घेत नाही, सहानुभूतीने साधी चौकशी कोणी करीत नाही, अशा अवस्थेत ही बहीण भाऊ देवाचे नाव घेऊन उत्तर हिंदुस्थानचा मार्ग आक्रमू लागली. एकाद्या गावांत भावाने मिळेल ते काम करावे, दोन चार रुपया महिन्याला मिळतील त्यावर कोठे कशी तरी गुजराण करावी आणि पुढचा रस्ता धरावा असा क्रम चालू झाला. गावोगाव शेकडो शहाणे गृहस्थ त्यांच्या आंगावरून आले गेले, पण एकानेही त्यांच्या
बुद्धिमत्तेची किंवा संस्कृत ज्ञानाची माणुसकीने दखल घेतली नाही. आहेत कोणी तरी भिकाऱ्याची पोरे, मागतील भीक, जगतील कशीही नाही तर मरतील! समाजाची दृष्टि आजही अशीच आढळते.
एका गावी एका श्रीमंत गृहस्थाने मात्र त्यांच्या संस्कृत ज्ञानाची कदर करून त्यांना आपल्या घरात आश्रय दिला. श्रीनिवासने रोज भागवत पुराण वाचावे आणि रमाबाईने संस्कृत काव्यांवर रसाळ प्रवचने करावी. थोड दिवसात त्याना या परावलंबी जीवनाचा कंटाळा आला आणि ते उत्तर हिंदुस्थानात पायपीट करीत गेले. “माझ्या आयुष्यात कमीत कमी १५ हजार मैल अनवाणी पायपिटी मी केली” असे रमाबाई म्हणत असत. या
वनवासाचे त्या असे चित्र काढतात:
“मधूनमधून माझ्या भावाला काम मिळे, तथापि आमचा बहुत काळ भटक्यासारखाच जाई. बरेच दिवस उपाशी रहाण्याचेही प्रसंग पडत. म्हणून मूठभर दाणे भिजवून थोड्या मिठाबरोबर ते खावे लागत. पांघरायला घोंगड्या अथवा दुसरी जाड वस्त्रे आमच्यापाशी मुळीच नव्हती. छत्रीचे तर नावच नको. सगळा प्रवास पायी नि अनवाणी. रात्र पडली म्हणजे रस्त्याच्या बाजूच्या एका झाडाखाली, पुलाच्या कमानीखाली, नाही तर चक्क उघड्या जागेवर आकाशाचे छत आणि जमिनीचा बिछाना करून विश्रांतीसाठी आंग टाकायचे. एकदा पंजाबात झेलम नदीच्या काठी रात्र काढण्याचा प्रसंग आला. थंडी म्हणते मी. सारे अंग महिरून गेले. काही सुचेना. अखेर नदीच्या वाळूत दोन खळगे खोदून त्यात आम्ही गळ्याइतके स्वतःस पुरून घेतले. कधिकधि भुकेने पोटात इतकी आग पडायची की ती शमवण्यासाठी आम्ही सालीसकट रामफळे खावून त्यांच्या बियाहि गट्टम् करीत असू. "
देवाधर्माच्या नावावर ढोगेसोंगे
“अंगाला राख फासणारे, जटा वाढवून गावोगाव धार्मिक अरेरावीने भीक मागत भटकणारे साधू गोसावी यांची संख्या हिंदुस्थानात कोटीकोटी गणतीची आहे. त्यांचा आयुष्यक्रम किळसवाणा असतो. बहुतेक सारे ज्ञान शून्य असूनहि साधुत्वाचा नि योगसामर्थ्याचा मोठा डौल आणतात. तंबाखू, गांजा, भांग, अफू असल्या अमली व्यसनात ते नेहमीं तर्र असतात. त्यांच्या भाषणात ग्राम्यपणा नि अश्लीलपणा फार. शील कशाशी खातात हे तर त्यांच्या गावीहि नसते. एकाद दुसरा अपवाद असेल, नाही असे नाही. पण बहुतेकांची तऱ्हा अशीच.” असा आपला अनुभव रमाबाई सांगतात. वडील मातोश्रीनाहि हा अनुभव होताच. पण ते म्हणत: “फसवून लुबाडण्यासाठी साधू, गोसावी आणि तीर्थोपाध्ये हव्या तशा खोट्यानाट्या गोष्टी सांगतात, थापा देतात, धमक्यादि देतात, इतके आम्हाला खास माहीत असूनहि आम्ही त्याना वंदनीय पूजनीय का मानतो? तर धर्मशास्त्रात तसे सांगितले आहे म्हणून. प्रसंगविशेषी आम्ही काही सोंगाड्यांची हजेरी घ्यायलाही कमी केले नाही.” पोथीतल्या शब्दांप्रमाणे आचार विचारांची
खुरमुंडी करणारांच्या आयुष्याचा असाच गाथागोंधळ व्हायचा! लोकांचे जीवन या भ्रमाने बरबाद केले.
ढोंगधतुऱ्याचे दोन अनुभव
(१) कृष्णाची बुडालेली द्वारका समुद्रातून वर येते!
सन १८७१ सालची गोष्ट. रमाबाई त्या वेळी १३ वर्षांच्या होत्या. अनंतशास्त्र्यांच्या तीर्थयात्रेची छावणी काठेवाडात द्वारकेला पडली होती. द्वारका म्हणजे वैष्णवांचे महाक्षेत्र. डोंगरे कुटुंब वैष्णवपंथी. समुद्र म्हणजे सगळ्या तीर्थांचे माहेरघर. समुद्रस्नानाने सगळी पातके तडाक्यासरशी भस्म होतात असा धर्मवान हिंदूंचा विश्वास! एवढ्यासाठी अनंतशास्त्री द्वारकेला सह कुटुंब एक वर्षभर राहिले होते. या वर्षी साठ वर्षांनी येणारा कपिलाषष्ठी योग होता. याच योगावर श्रीकृष्णाने सोने हिरे माणकानी बांधलेली आणि पुढे समुद्रांत बुडवलेली द्वारका नगरी समुद्राच्या सपाटीवर येऊन पुण्यवंताना स्पष्ट दर्शन देते म्हणतात. अर्थात् तेवढे पुण्य साधण्यासाठि साधू गोसावी ब्राम्हण भिक्षूक तीर्थोपाध्ये याना दान दक्षणा भोजनानी संतुष्ट करणे जरूर असते. शास्त्रीबोवानी जवळच्या होत्या नव्हत्याची आणून हे सारे यथासांग केले. शिवाय त्रिकाळ समुद्रस्नानाच्या बुचकळयापर्यंत पाण्यात उभे राहून सहकुटुंब सहपरिवार मंत्रघोषणाचा सपाटा सारखा चालू ठेवला. कपिलाषष्ठीच्या दिवशी आपल्याला ती सुवर्णाची द्वारका दिसावी, आपली असतील नसतील ती सारी पापे भस्म व्हावी, देव आपल्यावर प्रसन्न व्हावा आणि पूर्वीचे आपले गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे, एवढ्यासाठी हा सारा खटाटोप!
सुवर्ण द्वारकेचे दर्शन घेण्यासाठी हिंदुस्थानाच्या दहाहि दिशाहून लाखोलाखो धर्मवंत हिंदू धावून आले. दान, दक्षणा, समुद्रस्नाने ब्राम्हण भोजनांचा धूमधडाका चालू झाला. अखेर तो मंगल दिवस उजाडला. सरोवरात सुसरी आहेत, संभाळा.
आज आपल्याला सोन्याची बुडालेली द्वारका समुद्रसपाटीवर आलेली प्रत्यक्ष दिसणार, म्हणून जो तो आशेच्या मुठीत जीव धरून वाट पहात बसलाय. सकाळी ढगार आले आणि धुकेहि बरेच होते. पण तीन प्रहरापासून आकाश स्वच्छ होऊ लागले. संध्याकाळच्या सुमाराला मावळत्या सूर्याचे तांबडे पिवळे सुन्दरी किरण समुद्राच्या पाण्यावर चमकू लागताच एक सुंदर मनोवेधक देखावा निर्माण झाला. मुंबईच्या समुद्रावर असे देखावे पुष्कळानी पुष्कळ वेळा पाहिले असतील. तोच प्रकार तेथे झाला. पण लोकाना वाटले, `हां हां दिसली दिसली सोन्याची द्वारका.` काही जण कुजबुजले `छे. ती तर सूर्याची किरणे होती नुसती. ती अशीच लाटांवर चमकायची. सारा कल्पनातरंगांचा खेळ.` द्वारका फक्त पुण्यवानालाच दिसायची! तेव्हां `आपल्याला दिसली नाही असे सांगून स्वताला पापी ठरवणारा कोण शहाणा पुढे येणार? जो तो दिसली, मला दिसली` अशीच बडबड करीत सुटला. द्वारकादर्शनाने यात्रेकरूंच्या कर्माची कटकट किती मिटली ती त्यांच्या कर्मालाच माहीत. पण त्यानी वारेमाप उ दान दक्षणांच्या बहुमोल द्रव्यानी तीर्थोपाध्यांच्या तिजोऱ्या मात्र गडगंज तुडुंब भरल्या. हा भोळसटपणाचा बाजार अझूनहि द्वारकेला चाललेला असतो.
[२] रेवळसरातले तरंगते सप्तर्षि
सन १८७० साली हिमालयाच्या आसपास भटकत असताना मंडीपासून फार दूर नसलेल्या रेवळसर नांवाच्या सरोवराजवळ रमाबाई नि श्रीनिवास आले. क्षेत्रविधि करण्याचे हे एक मोठे पवित्र स्थान समजतात. क्षेत्रोपाध्यानी दोघाची चवकशी केली. दोघेहि भणंग भिकारी दिसले. दिसले कसले? होतेच मुळी. "आम्ही दुष्काळातून भटकत आलेले निर्वासित आहोत" असे सांगताच भटजी म्हणाले, "संभाळा हो, या सरोवरात प्रचंड सुसरी आहेत. स्नानासाठी आंत उतरूबितरू नका."
रमाबाई: सरोवरात या सात टेकड्या हो कसल्या?
भटजी: त्या टेकड्यांच्या रूपाने आकाशांतील तारकापुंजातले सप्तर्षी येथे तपश्चर्या करीत असतात, दानदक्षणेने आम्हा क्षेत्रस्थ भूदेवाना संतुष्ट केल्याशिवाय त्या ऋषींच्या टेकड्यांजवळ जावून त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घेणे दुरापास्त आहे. सप्तर्षि प्रसन्न झाले तर आपोआप ते चालत काठाजवळ येऊन पुण्यवंत भक्ताना दर्शन देतात. इतराना सुसरी गटागट गिळून फस्त करतात. या भानगडीत तुम्ही पडू नका बरं. तुम्ही दरिद्री, भिकारी, फुकट प्राणाला मुकाल.
जागोजाग देवधर्माच्या नांवांवर चाललेले खेळखंडोबा बहिण भावाने अनुभवलेले असल्यामुळे, असल्या थोतांडांवरचा त्यांचा विश्वास आता साफ उडालेला होता. सरोवरात गेलोच तर काय होईल? सुसरी आपल्याला खातील. छान होईल. उपाशी जगण्यापेक्षा असले मरण काय वाईट? आपण तर मरणाचीच वाट पहात आहोत. असा विचार करून उजाड पहाटे बहीण भाऊ सरोवरात शिरली. सप्तर्षीचे दर्शन झाले तर उत्तम सुसरीनी गट्ट केले तरीहि उत्तमच. अशा निश्चयाने ते प्रत्येक टेकडीजवळ पोहत गेले.
पहातात तो काय चमत्कार सांगावा! देवदार लांकडांच्या तराफ्यावर दगडमाती रचून त्यांवर गवत पाला झाडे उगवलेल्या त्या कृत्रिम टेकड्या होत्या. पुण्यवानांच्या मोक्षासाठी आपोआप काठाकडे त्या येतात म्हणजे भटजी त्याना गुपचूप लोटीत आणतात. भोळ्या भाबड्याना तो दैवी चमत्कार वाटायचा आणि ते तीर्थोपाध्यांच्या झोळ्या दानदक्षणानी भरायचे.
रमाबाई नि श्रीनिवास स्नाने करीत असतानाच उपाध्ये तेथे आले. त्यांना पाहून रमाबाई म्हणाली, "भटजी महाराज, आमची स्नाने निर्विघ्न पार पडली. सातहि ऋषीनी आम्हाला दर्शन दिले. सुसरी मात्र भेटल्या नाहीत. (श्रीनिवास एका टेकडीला लोटीत लोटीत काठाजवळ आणीत असलेला दाखवून) ते पहा एक ऋषि आम्हाला निरोप द्यायला येताहेत मागेमागे. आम्ही आज धन्य झालो. पुण्य फळा आले.”
पोरानी आपल्या धंद्याचेच बिंग हुडकून काढलेले पहाताच, मंडळीनी मुकाटतोंडी पोबारा केला.
वनवासातून सज्जनवासात
जन्माला येऊन अवघे सहाच महिने झाले असतील नसतील तेव्हापासून तब्बल २० वर्षे तीर्थयात्रा, वनवासाची हज्जारो मैलांची पायपिटी नि उपासमार रमाबाईच्या नशिबी अखंड लागलेली होती. शनीची साडेसाती साडेसात वर्षांचीच असते म्हणतात. पण आयुष्याच्या सुरुवातीचीच तब्बल वीस वर्षे रमाबाईच्या जीवनाचा उकीरडा करणारा ग्रह कोणता, हे कोडे ज्योतिषानाहि सुटण्यासारखे नाही. ग्रहदशा अनुकूल नसतां एकादा मोठा पट्टीचा गवई घरोघर दारोदार ताना ठोकीत फिरला तरी मूठभर तांदळाची त्यावर मेहरबानी करायला कोणाला सुचायचे नाही. पण काळ अनुकूल होताच, तोच गवई स्वताच्या झोपडीत सहज नुसता शिंकला तर “ओ हो हो, काय हो पल्लेदार भैरवीची तान ही" म्हणून सारे लोक तेथे जमा होतील. प्रतिकूल काळांत थोड्याशा गरजेसाठी साऱ्या गांवात जोडेफाड केली तर जोड्याच्या टाक्यापुरतीहि दाद कोणी घेत नाही. पण तोच काळ पालटला का हजार मैलांवरचे रसिक `घ्या घ्या` म्हणून त्याच्या भेटीसाठी धावत येतात. दुनियेचा बाजार असा उलट्या पावलांचा आहे.
श्रीनिवास आणि रमाबाईची ग्रहदशा पालटली. सन १८७८ च्या सुमारास ते कलकत्ता शहरात येऊन दाखल झाले. ईस्ट इंडिया कंपनी सरकार बहादुरांची ही राजधानी. प्राचीन मनुस्मृतीच्या दण्डकांवर डोळे मिटून विश्वासाने आचार विचार करणारे लाखो लोक या शहरात होते आणि तसल्या धर्माचरणांत मनाला शांति नाही, माणुसकीला वाव नाही, स्त्रियांच्या उद्धाराला कोठेच जागा नाही, असल्या पोती भिक्षुक-पूजक धर्माच्या नादाने भावी पुरोगामी जमान्यात हिंदुजनांना कोठेहि टिकाव धरता येणार नाही, म्हणून त्यांतला वाईट भाग कापून काढून चांगल्याचा तेवढा जोराने पुरस्कार करावा, अशा विचारानी थरारलेले शेकडो पंडितहि होते. या विचारसरणीचे बंगल्यातले आद्य बण्डखोर राजा राममोहन रॉय त्यांच्या पावलांवर पाऊल ठेऊन केशवचंद्र सेन, पंडित महेशचंद्र न्यायरत्न, कालीचरण बानर्जी प्रभृती मंडळीनी ब्रम्हो समाज संस्था चालवून हिंदुधर्माचे नवीनीकरण
जोराने चालवले होते. शिवाय शास्त्रांचे सामाजिक दण्डक, रूढींचे प्राबल्याने आचार विचारांचा नित्य होत असलेला कोंडमारा, स्त्रियांची सर्वागीण अवनति इत्यादि हिंदूधर्माच्या जुलमी गोलमालाला विटलेल्या आणि इंग्रेजी ज्ञानाने सत्यशोधक नि चिकित्सक बनलेल्या नवहिंदू तरुणांसाठि माणुसकीचा भूतदयेचा आणि महिलोद्वाराचा सोपा मार्ग दाखवणाऱ्या क्रिस्ती धर्माचे मोठमोठे मिशनरी कलकत्त्यास ठाण मांडून बसलेच होते.
`सरस्वती देवी` अवतरली
आतापर्यन्त पोटभरू लुटारू भिक्षुक उपाध्ये गंजड गोसाडे यांनी गजबजलेल्या तीर्थक्षेत्रादि ठिकाणी आयुष्य घालविलेल्या बहिण भावाला कलकत्ता शहर पहाताच आपण माणसांत आल्याचा साक्षात्कार पटला. एका वस्त्रानिशी आलेल्या २० वर्षांच्या, चमकदार चित्पावनी घाऱ्या डोळ्यांच्या सौंदर्यवान पण सभाधीट रमाबाईने एका देवळात तेथल्या मंडळीना आपल्या संस्कृत ज्ञानाची, पांडित्याची आणि अस्खलित प्रवचनाची चमक दाखवताच नगरात एक महापंडिता आल्याची बातमी बिजलीच्या वेगाने कलकत्ता शहरभर फैलावली. उपासतापासाने दोघांचे देह जरी कृश झालेले होते, तरी ज्ञानाची संस्कृतीची नि अविचल नीतिमत्तेची झकाकी त्यांच्या तोंडांवरून ओसंडत होती.
सुधारक पुरोगामी गटाच्या बंगाली पंडितांचे लक्ष रमाबाईने तात्काळवेधून घेतले. तिची संस्कृत भाषेतली व्याख्याने प्रवचने नि चर्चा ऐकून मोठमोठया पट्टीच्या दशग्रंथी पंडितानी आश्चर्य व्यक्त केले. पुराण ग्रंथांतील आठरा हजार संस्कृत श्लोक घडाघडा पाठ म्हणून तिने संकृतज्ञ शास्त्र्याना चकित केले. तिचे व्याकरणातील नैपुण्य पाहून वैय्याकरणी दिग्मूड झाले.
ही प्रत्यक्ष सरस्वतीच पृथ्वीवर अवतरली असे जो तो बोलू लागला. बंगाल्यातल्या देशी विदेशी वृत्तपत्रानी रमाबाईवर मोठमोठे अग्रलेख लिहून तिच्या अवचित आगमनाचा हिंदुस्थानभर डंका पिटला. मुंबईच्या टाइम्स ऑफ इंडिया, हिंदू प्रकाशित पत्रांत " रमाबाई नांवाची कोणी वीस वर्षांची मराठी तरुणी कलकत्ता येथे आली असून, तिने आपल्या विद्वत्तेने शीघ्र कवित्वाने आणि संस्कृतभाषा पटुत्वाने प्रोफेसर टॉनी, पंडित महेशचंद्र न्यायरत्न, केशवचंद्र सेन, आनंद मोहन घोस प्रभृति मोठमोठ्या पुढाऱ्याना नि पंडिताना चकित करून टाकले आहे.” अशी बातमी येताच "कोण हो ही? तिकडे बंगाल्यात कशी गेली! का गेली?" इत्यादि चौकशा महाराष्ट्रात चालू झाल्या.
प्रकरण ४ थे
सत्कार सन्मान आणि भविष्याचा शोध
जागोजागच्या शास्त्रीपंडितांच्या सभांतून आणि धर्ममण्डळांतून रमाबाईला व्याख्याने प्रवचनांची निमंत्रणे येऊ लागली. सत्कार सन्मानांची झुंबड उडाली. कलकत्ता येथील सिनेट हाऊसमध्ये सर्व जुन्या नव्या मतांच्या शास्त्री पंडित पुढाऱ्यांची आणि संस्कृताच्या प्रोफेसरांची प्रचंड जाहीर सभा भरली. आपल्या बरोबरीचीच एक विद्वान स्त्री या नात्याने सर्वांनी रमाबाईचा हार्दिक सत्कार केला. संस्कृत कविताबद्ध एक मानपत्र अर्पण करून रमाबाईला `पंडिता` पदवी दिली. `आपण प्रत्यक्ष सरस्वतीदेवीच आहात’ या मानपत्रातील उल्लेखाला रमाबाईनी तात्कालिक संस्कृत शीघ्र कवितेने उत्तर दिले:- "आपण माझी जी एवढी प्रशंसा केली तिला मी मुळीच पात्र नाही. मी सरस्वती नव्हे, तर त्या देवीच्या दरबारातील एक विनम्र सेविका आहे आणि भारतीय अबलांच्या शैक्षणिक नि सर्वांगीण उद्धारासाठी मी आपले आयुष्य वेचणार आहे. आपल्या सर्व पंडितामणींचा आशीर्वाद असावा." सरस्वती आणि पंडिता या बहुमानाच्या पदव्या रमाबाईशिवाय इतर कोणत्याहि हिंदी स्त्रीला मिळालेल्या नाहीत.
महिलोद्धाराची पहिली आरोळी
केशवचंद्र सेन वगैरे मंडळीनी रमाबाईना आपापल्या घरी बोलावून, आळ मोहऱ्यातल्या पडदानशीन स्त्रियांपुढे व्याख्याने देण्याचा उपक्रम केला. पंडिता संस्कृतांत बोलत आणि कोणीतरी शास्त्री बंगाली भाषेत त्याचा तर्जुमा सांगत असे. एकदा बाबू ज्योतिंद्र मोहन टागोर यांच्या घरी बंगाली पंडितांची सभा भरून रमाबाईंच्या जीवनाविषयीच्या कल्पनांची खूप कसोशीने परीक्षा घेण्यात आली. शास्त्रपुराणांतले प्राचीन आधार दाखवून स्त्रियानी नुसते साक्षर नव्हे तर सुविद्य होऊन, पुरुषांच्या बरोबरीने समाजकारण धर्मकारण राजकारण हाताळण्यात काही पाप नाही. तो त्यांचा अधिकारच आहे.` हा सिद्धांत हजरजबाबी कोटीक्रमाने जितका ठसठशीत मांडला की सारे सभाजन कौतुकाने माना डोलवू लागले.
बाबू आनंद मोहन पोस यांच्या घरी स्त्रियांची सभा भरली असता पंडिता रमाबाईनी द्रोपदी देवकी सत्यभामा सावित्री इत्यादि पौराणीक महिलांची उदाहरणे देऊन पुरुषांच्या बरोबरीने सार्वजनिक सर्व कार्यात पूर्वी स्त्रिया कशा भाग घेत असत, हे सांगितले. त्या आणखी म्हणाल्या.‘प्राचीन काळी भरतखंडात बालविवाहाची रूढी मुळीच नव्हती. मुलींचे बालपणी लग्न
केले नाही आणि त्याना शिक्षण दिले तर त्या दुर्वर्तनी निघतील, हा भ्रम मूर्ख लोकानी रूढ केलेला आहे. पुराणकालीन यच्चयावत थोर लौकीकवाही महिलानी प्रौढावस्थेत स्वयंवराचा हक्क गाजवलेला आहे आणि आपल्या विद्वत्तेने मोठमोठे समाजकारण नि राजकारणी मुकाबले सोडवून देशाचे कल्याण साधलेले आहे.’
क्रिस्तपंथियांची पहिलीच ओळख
कलकत्त्यास एक वर्ष मुक्काम असताना, पंडिताबाईचा शेकडो ब्राम्हण विद्वानांशी परिचय झाला. पण क्रिस्तीधर्म आणि मिशनरी यांविषयी त्याना कसलीच काही माहिती नव्हती. एक दिवस त्याना क्रिस्ती मंडळींच्या स्नेह संमेलनाचे निमंत्रण आले. क़िस्तीजन म्हणजे कोण? काहीच उमगे ना त्याना. अनेक ब्राम्हण मित्रांच्या सांगण्यावरून श्रीनिवासासह त्या संमेलनाला गेल्या. त्या प्रसंगीची हकिकत रमाबाई अशी सांगतात: "किस्तीजनांच्या मेळाव्यात जाण्याचा आमच्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग. तेथे जमलेल्या सर्व मंडळीनी आमचे फार आपुलकीने स्वागत केले. खुर्च्या टेबले सोफे दिवे वगैरे थाट अगदी नव्यानेच आम्हाला दिसला. जमलेले अनेक हिंदी स्त्री-पुरुष इंग्रेजी पद्धतीचा पोषाक करून अगदी `साहेब` बनलेले आणि बोस बानर्जी ही नांवे तर ब्राम्हणांची! बुचकळयात पडलो आम्ही. हे लोक इंग्रेजी लोकांच्या हातचा चहा पीत होते नि बिसकिटे खात होते. त्यानी आम्हालाहि चहा बिसकिटाचा आग्रह करतांच आम्ही दचकूनच गार झालो. वाटले, कलकत्ता शहरात कलीने पुरा कहर माजवला आहे. म्हणूनच हे चांगले चांगले ब्राम्हण खुशाल गोऱ्या अंग्रेजांच्या हातचे अन्न खातात. स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाकडे आम्ही नवलायीने पाहू लागलो. पण ते सारे काय करतात हे काहीच उमगे ना. थोड्या वेळाने एका इसमाने एक पुस्तक उघडले, काही वाचले आणि एकदम सगळ्या स्त्री पुरुषानी भडाभड आपल्या खुर्च्या पुढे ढोपरे टेकून, डोळे मिटून, तोंडाने काही पुटपुटायला सुरुवात केली. ‘ईश्वराची प्रार्थना करताहेत ते` असे आम्हाला कोणीस सांगितले. ईश्वराची प्रार्थना? त्यांच्यापुढे आम्हाला एकहि देवाची मूर्ति दिसे ना! जणू काय ते आपापल्या पुढच्या खुर्च्याचीच आराधना करीत आहेतसे आम्हाला दिसले. क्रिस्ती अंशप्रार्थनेचा हा विचित्र प्रकार आम्हाला चमत्कारीकच वाटला. मला आता नांव आठवत नाही, पण तेथल्या एका पोक्त गृहस्थाने संस्कृत बायबलाची सुंदर सोनेरी आकर्षक कवराची एक प्रत मला भेट दिली."
अंधारातले घूत्कार
रमाबाईचा सर्वत्र असा सन्मान चालू असतानाच, पोथीनिष्ठ जुन्या मतांच्या लोकाना, `ही एवढी बावीस वर्षांची ब्राम्हण तरुणी अझून अविवाहित का राहिली?` याचे मोठे कोडे पडले. त्यानी भलभलत्या कुटाळक्या फैलावल्या पण एकदा का रमाबाई सभास्थानी आल्या, आपल्या धीट चमकदार नेत्रांनी श्रोत्यांची पहाणी करू लागल्या आणि त्यांची मुद्देसूद काव्यप्रचुर संस्कृत प्रवचनाची गंगा धो धो गर्जत वाहू लागली म्हणजे सगळ्या निंदकांच्या जिभल्या गारठून पडत असत. रमाबाईची कांतिं पाहून ऐकून, बंगाल संयुक्त प्रांतात रहाणाऱ्या काही दक्षिणी ब्राम्हण तरुणानी त्याना विवाहाच्या मागण्या घातल्या होत्या. पण“जोवर माझा भाऊ श्रीनिवास माझ्या पाठीशी उभा आहे तोवर मला विवाह करायचा नाही. भारतीय अबलांचा शिक्षणोद्धार आणि त्यांचे जीवन सुखी नि स्वावलंबी करण्यातच आयुष्य वेचावे, असा माझा निर्धार आहे." असा जबाब त्या देत असत. विवाहाच्या प्रश्नाबाबत पंडिता रमाबाई आपल्या आत्मवृत्तात लिहितात, "माझ्या वडलांच्या मनातून मला उत्कृष्ट प्रकारचे धर्मशिक्षण
द्यावयाचे होते म्हणून त्यानी माझे लग्न केले नाही. या रूढीविरुद्ध त्यांच्या अट्टहासाबद्दल बाबाना घरचा नि दारचा पुष्कळ छळ सोसावा लागला. ब्राम्हणांनी तर त्याना वाळीत टाकल्यासारखेच वागवले. पण बाबा मुळीच कचरले नाहीत. त्यानी आपला हेतू पूर्ण तडीला नेला. विद्यार्जन करून धार्मिक वृत्तीत आयुष्य घालवण्याची त्यानी मला दीक्षा दिली. म्हणूनच मी बावीस वर्षाची होईतोवर अविवाहित राहिले. या पूर्वी उत्तर हिंदुस्थान, मध्यप्रांत आणि बंगाल येथल्या पुष्कळ सुखवस्तू दक्षिणी ब्राम्हणानी अनेकदा लग्नाची गोष्ट काढली, पण भावाचा मला आधार असल्यामुळे मी त्या मागण्या नाकारल्या.
महाराष्ट्राचे रमाबाईना आमंत्रण
बंगाल आसाम बिहार कडे रमाबाईचा होत असलेला जाहीर सन्मान आणि सत्कार ऐकून, मुंबई पुण्याकडच्या पुरोगामी सुधारकानी महाराष्ट्रात येण्याबद्दल तिला पत्रे पाठविली. काहीजण तिला प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देऊन गेले. एवढी लोकोत्तर पंडिताबाई इकडे आली तर महाराष्ट्रात महिलोद्धाराच्या चळवळीचा खूप उठाव करता येईल अशी त्या सुधारकांची रास्त महत्वाकांक्षा होती. जुन्या मतांच्या लोकानाहि पंडितेच्या परप्रांतीय मानमान्यतेचे एक आकर्षण वाटतच होते. रमाबाईना मात्र महाराष्ट्राविषयी तितकेसे आकर्षण वाटत नव्हते. जन्मापासून त्या मायभूमीने रमाबाईविषयी किंवा तिच्या मातापित्याविषयी काय अशी माणुसकीची आपुलकी दाखवली?
अखेर विवाह-संस्कार झाला
रमाबाईचा लोकीक बंगालबाहेर आसाम बिहारकडे फैलावला आणि तिकडून त्याना निमंत्रणे आली. स्नेही मंडळींचा परीघ वाढला. आसाम प्रांतातील सिलचर येथील बाबू बिपिन बिहारी दास मेधावी एम.ए, बी. एल. तरूण हायकोर्ट वकीलाशी श्रीनिवासच्या मध्यस्थांने रमाबाईचा परिचय झाला. बिपिनबाबू ब्राम्हणेतर होते. बंगाल आसामकडे धर्मशास्त्री दोनच जाती मानतात. एक ब्राम्हण जात आणि बाकीचे सारे शूद्र. तेव्हा ब्राम्हणेतर म्हणजे शूद्र. हा जातीभेदाचा दण्डक आजहि तिकडे मानण्यात येतो. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातहि हा प्रकार आजहि आढळतो.
या परिचयाच्या सुमारासच भाऊ श्रीनिवास एकाकी मरण पावला. या जगातला रमाबाईचा अखेरचा आधार नष्ट झाला. परक्या मुलखात त्या पोरक्या पडल्या. शेवटी, अनेक वजनदार गृहस्थांच्या शिफारशीवरून त्यानी परिचित अशा महाशय बाबू बिपिन बिहारी दास मेधावी यांच्याशी कलकत्त्यानाजिक बंकिमपूर येथे नोंदणी पद्धतीने विवाह केला. (ऑक्टोबर १८८०). "त्यांचा किंवा माझा हिंदुधर्मावर अगर क्रिस्ती धर्मावर मुळीच विश्वास व्हता, म्हणून आमचे लग्न सिव्हिल मॅरेज कायद्याप्रमाणे झाले” असे रमाबाई सांगतात.
धर्माविषयी मनाची कालवाकालव
हिंदुधर्मशास्त्रांप्रमाणे कडकडीत नेम आचार आहार संभाळूनहि मनाला शांती लाभली नाही, माणुसकीचाहि कोठे ओलावा आढळला नाही, स्त्रीयांचा दर्जा आणि मानसिक अवनति शूद्रातिशूद अस्पृश्यता इतकीच खालावलेली वेद-स्मृतिपुराण-प्रमाणित हिंदू धर्म-व्यवस्थेत उद्धाराला अवकाश नाही, सोयच नाही. याचा पुरेपूर अनुभव आल्याने रमाबाई या वेळी साशंकवादी बनल्या जात्या त्यांचा पिण्ड धार्मिक होता आणि अखेरपर्यन्त तो धार्मिकच राहिला. पण माणसाच्या
आत्मोन्नतीला चालू हिंदुधर्म निरुपयोगी, एवढा सिद्धांत मनोमन पटल्यामुळे माणूसकीचा मार्ग दाखवणारा निराळा एकादा धर्मपंथ शोधण्याकडे त्यांच्या मनाचा कल धावा घेऊ लागला होता. त्यानी वेद, अपनिषदे, वेदांग स्मृत्यात सर्व पंथाचा कसून स्वाध्याय केला. पण कोठेच त्याना समाधान लाभले नाही. आत्मवृत्तात त्या म्हणतात "कोणत्या तरी धर्माची मला मोठी आवश्यकता वाटू लागली. हिंदू धर्मात तर माझ्या जिवाला कोणतीच आवड दिसली नाही. ब्रम्होपंथात तर नक्की असे काहीच आढळे ना. सर्वच मोघम आणि सर्व धर्मातील चांगले दिसले तेवढे वेचून घेऊन त्यांची खिचडी बनवलेली त्यामुळे माझ्या मनाचे समाधान होई ना."
महाराष्ट्रात भयंकर खळबळ उडाली
रमाबाईने चांगल्या चांगल्या ब्राम्हण तरुणांना डावलून अखेर एका आसामी शूद्राशी विवाह केल्याची बातमी महाराष्ट्रात येताच, जो तो नाक मुरडू लागला. "छे छे छे, बायका म्हणजे `अनृतं साहसं माया` असे शास्त्रकार सांगत आले ते काय खोटे? तशात ही बया शिकलेली! बायकाना शिकवा म्हणतात ना हे सुधारक? घ्या म्हणावे शिक्षणाची ही फळे! कलियुग कलियुग बरं का है! असाच भ्रष्टाचार चालायचा" असा भटभिक्षुक आणि धर्माभिमानी गृहस्थांत एकच आरडा ओरडा चालू झाला.
रमाबाईचा हा वैवाहिक संस्कार दुर्दैवाने औट घटकेचा बुडबुडा
ठरला. अवघ्या एकोणीस महिन्यांत तो आटोपला. ता. १६ एप्रिल सन १८८३ रोज त्यांनी आपल्या मनोरमा कन्येला जन्म दिला आणि पुढे एकच महिन्यात मेधावी एकाकी पटकीच्या आजाराला बळी पडले. ‘ब्राम्हणाच्या मुलीने विवाह केल्याबद्दल देवाने छान प्रायश्चित्त दिले,` अशा निष्ठूर वल्गनांचे धर्माभिमान्यांच्या छावण्यात भरपूर पीक आले.
प्रकरण ५ वे
पंडितेचे महाराष्ट्रात आगमन
पतिनिधनानंतर रमाबाईच्या चरित्राचे दुसरे क्रांतिकारक मन्वंतर चालू झाले. या वेळी कर्नाटक महाराष्ट्र नि आसाम येथली नात्यागोत्यांची बहुतेक माणसे एकामागून एक दिवंगत झालेली. जिवाला विरंगुळा नि आधार काय तो चिमुकल्या मनोरमा मुलीचा. केवळ कोठेतरी निष्क्रिय नि निराशावादी आयुष्य कंठण्यासारखा त्यांचा पिण्ड बेहिमती नव्हताच. वनवासातच जिचे बालपण नि तारुण्य गेले, वनवासाने जिला शौर्य, धैर्यादिगुणांचा कस लावून कर्तबगार बनवले आणि मातापित्याच्या अखंड धार्मिक शिकवणीने जिचा नैतिक पातळी उंचाऊन ईश्वरावरचा भाव अचळ अढळ बनला होता, ती पंडिता कोणत्याहि संकटाने डगमगणारी थोडीच होती? जातिवंताना संकटेच चैतन्याचे तेज चढवतात. संकटांच्या कडेलोटानेच त्यांचे आत्मतेज उफाळून उठते. कठोर परिस्थितीतूनच त्यांच्या कर्तबगारीच्या ठिणग्या चमकत उफलतात.
रमाबाई, मायभूमीला परत या
इंग्रेजी भाषेने हिंदी आचार विचारांत केलेली अपूर्व क्रांति आणि भारताबाहेरच्या प्रबुद्ध जगाशी जोडलेला संबंध रमाबाईनी बंगाल आसाम प्रांतांत पाहिलेला असल्यामुळे, त्या भाषेचा अभ्यास करण्याच्या हेतूने त्या मद्रासला आल्या. पण तेथल्या लोकांच्या अपरिचित भाषेमुळे त्यांचे तेथे काही जमे ना. इतक्यात सरदार लोकहितवादी गोपाळराव हरि देशमूख, रावसाहेब महादेव गोविंद रानडे, वामन आबाजी मोडक, दादोबा पांडुरंग, डॉ. भांडारकर प्रभृती पुरोगामी मंडळीकडून त्यांना पुन्हा निकडीचे बोलावणे आले आणि पंडिताबाई सन १८८२ साली पुण्यात आल्या.
पुण्याचे वातावरण खळबळले
चार वर्षापूर्वी पुणेकरानी पंडितेचे नुसते नांवच ऐकले होते. आता त्यांचे बुद्धीचे तेज, त्यांची अमोघ वक्तृत्वशक्ति, अष्टपैलू विद्वत्ता त्यांचे तारुण्यातील वैधव्य आणि आंगात पुऱ्या बाह्याचे पोलके आणि आपादमस्तक पांघरलेले ते पांढरेशुभ्र पातळ, या सर्व गोष्टींचा निरनिराळ्या दोन प्रकारानी लोकांच्या मनावर परिणाम झाला. त्या वेळी पुण्यात दोन परस्परविरुद्ध विचार समाजात तट होते. बाळ गंगाधर टिळकांच्या पुढारपणाखालचा `पुराणे फलप्राप्त्यर्थम्`चा जुना मतवादी कंपू आणि दुसरा रावसाहेब रानडे लोकहितवादी वगैरेच्या नेतृत्वाखालचा चिकित्सक सुधारकांचा कंपू. बाईंच्या कर्तृत्वावर नि भावी समाजसेवेच्या धडाडीवर सुधारकांची दृष्टी होती, तर टिळक कंपूला वांटे की बाओ दिसते चांगली, पण पुढे निघेल कशी कोण जाणे. उपनिषदांतील प्रज्ञावंत ज्ञानवंत महिलांचे प्रतिक रानड्याना रमाबाईत दिसले तर पुराणमतवादी भिक्षुकशाही कंपूला ती अनृतं साहसं माया` अशी दिसली.
पंडिता बाईंची पुणे शहरात जागोजाग पुराणे व्याख्याने होऊ लागली. पहिले पुराण रावसाहेब रानड्यांच्या बिन्हाडी झाले. हजारो स्त्री पुरुष सभांत धीटपणाने तासंतास व्याख्याने देणारी प्रेक्षकांवर नि श्रोत्यांवर विलक्षण छाप बसवून हजरजबाबी चातुर्याने शंकितांच्या शंकांचा फडशा पाडणारी एक चित्पावन तरुण विधवा, म्हणजे पुण्यातला तो एक चमत्कारच होता. शेकडो ब्राम्हण स्त्रिया बाईंच्या प्रवचनाना गर्दी करून जमत. स्त्रियानी साक्षर नि सुविद्य व्हावे, स्वतंत्र विचार करू लागावे, पुरुषांच्या बरोबरीने हरएक क्षेत्रात पुढे सरसावे, हे व्याख्यानांतले मुद्दे म्हणजे पुष्कळ स्त्रियांना नवऱ्या विरुद्ध बंड करण्याची बायकाना चिथावणी असे. पंडीतेच्या महिलोद्धारक स्पष्ट विचारांच्या मुद्यांविषयी पुष्कळ पुणेकर बायका कुशंका घेत. पण तिची प्रत्यक्ष गांठ घेऊन वाद किंवा निषेध करण्याची मात्र कोणालाहि छाती झाली नाही. मात्र, रिकामटेकड्यांच्या पुणेप्रसिद्ध अड्यांवर आणि बायकांच्या तोंडातोडी रमाबाईविषयी भलभलत्या कंड्या पिकवण्याचा बाजार खूपच माजला.
या वेळी रमाबाईचे धर्मातरहि झालेले नव्हते. त्यानी बामणेतर गृहस्था बरोबर विवाह केला होता इतकेच. तरीसुद्धा पुणेकर स्त्रीपुरुषांत त्यांच्याबद्दल कसकसल्या विचारांचे वारे वहात होते त्याचा एकच नमुना पहा.
"...ही बया जातिबाह्य! बाटगी! आमच्या घरात तिचा विटाळ कशाला? सुधारकानी वाटल्यास तिला मिठ्या माराव्या. पण तिचा सावळागोंधळ या घरात चालणार नाही. काय मेली, बापाने चांगले द्वारकेच्या श्रीकृष्णाशी लगीन लाऊन दिले, तरीमुद्धा तिने बंगाली बाबूशी लगीन लावून देह बाटवला. बरे, संसार तरी केला का? तेहि नाही. सगळे निरदाळन करून आता आलीय इकडे जगाची बाटवाबाटवी करायला”. खुद्द रावसाहेब रानड्यांच्या घरांतील बायांची ही मते, तर पुण्याचा भांग्या मारुतीचा कुटाळांचा अड्डा कसकसल्या कुटाळक्यांचे पेव घरोघर पसरवीत असेल याची कल्पना येते.
आर्य महिला समाज
रमाबाईच्या आगमनापूर्वी पुण्यातील सुधारकांच्या काही स्त्रिया आठवड्यातून एकदा कोठेतरी जमून स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार करीत असत. रमाबाई आल्यावर, रानडे भांडारकर मोडक केळकर इत्यादि प्रार्थना समाजीय मंडळांनी त्याना उत्तेजन देऊन, `आर्यमहिला समाज` नांवाची एक संस्था केली. तिच्या मार्फत रमाबाईची व्याख्याने चर्चा प्रवचने चालू झाली. समाजाचे मुख्य हेतू (१) बालविवाहादि अनिष्ट चालीपासून स्त्रियांची सुटका आणि (२) जुन्या परंपरेने आलेल्या धर्म व नीति यांच्या कल्पनांत भावनांत कालोचित बदल करणे, असे होते.
दर शनिवारी समाजातल्या पंडितेच्या प्रवचनाना शेकडो स्त्री पुरुषांची गर्दी जमू लागली. बाईची वाणी अस्खलित मधुर आणि प्रवाही. प्रतिपादनाची शैली खटकेबाज आणि आकर्षक यामुळे जुन्या नव्या मतांच्या मंडळींवर त्यांच्या स्त्री-विषयक नवीन मतांची छाप तेव्हाच पडत चालली. याच दिवसांत आर्य महिला समाजाची एक शाखा मुंबईला काढली. पंडिताबाईंनी मुंबई इलाखाभर प्रवचनांचा दौरा काढला. "पुरुष आपल्या स्त्रियांना आपली मालमत्ता समजतात. धर्मशास्त्राच्या दण्डकांकडे पाहिले तर स्त्रियांना स्वतंत्र असे कसलेच अस्तित्व नाही. या गुलामगिरीतून त्यांची सुटका व्हावी म्हणून आमची सारी धडपड. लोक म्हणतात, हे पुरुषांविरुद्ध बंड आहे. भयंकर पाप आहे. पुरुषांचा स्त्रियांविषयी असलेला दृष्टिकोन बदलण्यासाठी त्यांची खरमरीत कानउघाडणी केली नाही आणि स्वतःच्या सर्वागीण उद्धाराची धडपड केली नाही तर माझ्या मताने तेच मोठे पाप आहे." हा पंडितेच्या जाहीर व्याख्यानांचा मतितार्थ असे.
एका अभागी बालविधवेचे प्रथम दर्शन
पंडिता स्वता विधवा असल्या तरी महाराष्ट्रात बालविधवांचा किती छळ समाज करीत असे, याची त्याना स्पष्ट कल्पना नव्हती. पुण्यात व्याख्यानांचा कार्यक्रम चालू असतानाच एक दिवस कोणीतरी एका अल्प ब्राम्हण बालविधवेला घेऊन बाईकडे आला. ती रंगाने काळी कुट्ट, चकणे अगदीच कुरूप अशी होती. पांच वर्षाची असतानाच तिचे लग्न लावण्यात आले होते. लग्नानंतर थोडयाच दिवसानी तिचा नवरा मेला. तिची सासू सासरा तिचे तोंड पहायला राजी नव्हते. "चांडाळणीनं माझा मुलगा खाल्ला.
राक्षसीण आहे ही” असा सासूचा सारखा आक्रोश चालायचा. रमाबाई म्हणतात: "मी त्या गरीब बापडया अभागी पोरीकडे पहाताच,अशा परिस्थितीतल्या बायांसाठी काहीतरी मी करावे, या स्फूर्तीचा अंकूर माझ्या मनात रुजला गेला. हिंदु विधवांसाठी एक आश्रम काढण्याची कल्पना लोकांपुढे मांडू लागले. सहा महिने खूप धडपड केली, पण कोणाच्य हृदयाला द्रव येई ना. नंतर वाटले, आधी मीच वैद्यकीय शिक्षण घ्यावे आणि मग या अनाथ विधवांच्या तारणाच्या प्रश्नाला हात घालावा. विलायतेला जाण्याचे विचार माझ्या मनात घोळू लागले." विलायतेला निघेपर्यंत त्या बालविधवेचे पालन पोषण बाईनीच केले.
हंटर कमिशनपुढे पंडितेची साक्ष
सन १८८३ साली लॉर्ड रिपन व्हाअिसरॉयच्या अमदानीत, सर विल्यम हंटरच्या अध्यक्षतेखाली मुंबई इलाख्यातील शिक्षणविषयक प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी नेमलेले एक कमिशन पुण्यास आले. प्रमुख ब्राम्हण स्त्रिया आणि आर्य महिला समाजाच्या सभासदांच्या एकमुखी शिफारशीने पंडिता रमाबाईची कमिशनपुढे साक्ष झाली. “कमिशनपुढे तुम्ही कोणत्या आधाराने साक्ष देता?" असे हंटरसाहेबाने विचारतांच रमाबाई म्हणाल्याः “स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केल्याबद्दल हिंदु समाजाकडून ज्यांचा अतिशय छळ झाला, लोकांनी ज्यांच्या मार्गात अनेक अडचणी उत्पन्न केल्या आणि ज्यांच्यावर अखेर बहिष्कारही घातला, अशा एका दशग्रंथी पढिक ब्राम्हण पंडिताची मी कन्या असून, स्त्रियांचा दर्जा वाढवण्यासाठी आजन्म अखंड कार्य करीत रहावे, असा मी निश्चय केला आहे."
या वेळीं बाईना इंग्रेजी फारसे येत नव्हते. पुण्याच्या फीमेल ट्रेनिंग कॉलेजच्या प्रिंसिपलबाई मिस हरफर्ड जवळ त्या नुकत्याच शिक्षण घेत होत्या. सगळी साक्ष मराठीतच झाली. `मुलींच्या शाळा हायस्कुले अधिकाधिक उघडली पाहिजेत, तेथे ट्रेण्ड शिक्षिका असाव्या, इन्स्पेक्टर्स बायाच असाव्या. या शिवाय, हिंदी स्त्रियांची मोठ्यातली मोठी अडचण हणजे हुषार शिकलेल्या स्त्री डॉक्टरणींचा तुटवडा ही होय. पुष्कळ प्रकारच्या स्त्रीरोगांत आणि विशेषेकरून प्रसूतीच्या समयी पुरुषांस आपली स्थिति कळविण्याला आमच्या लज्जावति हिंदू स्त्रियांस फार संकोच वाटतो. पुष्कळ प्रसंगी प्राण गेला तरी त्या पुरुष वैद्याना आपली स्थिति कळविणार नाहीत. अशा अवस्थेत स्त्रीवैद्य डॉक्टरी शिक्षणाची तरतूद सरकारने तात्काळ करणे जरूरीचे आहे. या देशातले शेकडा ९९ लोक स्त्री शिक्षणाच्या विरुद्ध आहेत. स्त्रियांना समाजात काही महत्वाचा दर्जा आहे, हे त्यांना मान्यच नाही. बायकांत तीळाएवढा जरी दोष दिसला तरी ते त्या राईचा पर्वत करून तिच्या शीलाला कलंक लावतात. गरीब बिचाऱ्या बायका धीट नसतात. त्याना कशाचे काही ज्ञान अथवा माहितीहि नसते. एकाद प्रकरण कोर्ट कचेरीपर्यंत गेलेच, तर बोलक्या पुरुषांचा शब्द प्रमाण मानला जातो आणि बाईचे कोणीच काही ऐकत नाही... येथल्या बायकांत कसली हिंमत नाही, कशाचा उत्साह आकांक्षा नाही, धैर्य नाही, स्वतःच्या पायावर उभे रहाण्याची ताकद नाही, काही नाही. जिकडे पहावे तिकडे नकारघंटा." इत्यादि मुद्यांवर सडेतोड दिलेली रमाबाईची साक्ष पाहून विल्यम हंटर साहेबाना मोठे कौतुक वाटले. विलायतेस परत गेल्यावर साहेबाने त्या साक्षीचे इंग्रेजी भाषांतर करवून ते प्रसिद्ध केले आणि एडिंबरो येथे साक्षीतल्या मुद्यांवर एक जाहीर व्याख्यान देऊन तेथल्या श्रोतृगणाना रमाबाईच्या अपूर्व माहितीने चकित केले. त्या काळी हिंदुस्थानात एवढी सुशिक्षित धीट नि पोक्त विचारांची कोणी स्त्री असेल असे विलायतेतील लोकांच्या स्वप्नीहि नव्हते. रमाबाईची साक्ष महाराणी विक्टोरियाच्या वाचनांत आली. पुढे त्यांच्याच खास सूचनेवरून लेडी डफरिन फंड, डाकटरणी आणि हिंदी स्त्रियांसाठी खास ईस्पितळांची योजना करण्यात आली.
विलायतेला गेलेच पाहिजे
पंचखंड दुनियेच्या विविध क्षेत्रांतील शास्त्रीय ज्ञानाचा महासागर इंग्रजी भाषेत अपरंपार भरलेला आहे, याची रमाबाईना प्रतीति आल्याने आणि तेवढे शिक्षण हिंदुस्थानात मिळणे कठीण असल्यामुळे, आपण विलायतेला गेलेच पाहिजे, असा त्यानी निर्धार केला. आर्य महिला समाजासाठी इलाखाभर काढलेल्या त्यांच्या दौऱ्यांत, कौतुक उत्तेजनापेक्षा विखार आणि निंदेलाच त्याना विशेष टकरा द्याव्या लागल्या. हिंदु समाज मनोवृत्ति म्हणजे कठीण फत्तराची एक विशाळ तटबंदीच असल्याचा त्यांना अनुभव आला. सुधारक म्हणविणाऱ्या मंडळींतहि लेचेपेचेपणा फार. समाज न दुखवता साधेल तेवढे साधून घेण्याची त्यांची धोरणे. ठोसर भरीव परिणामकारक सुधारणा घडवून आणायची तर कार्याची कदरहि तितकीच कट्टर असली पाहिजे, तसले वातावरण निर्माण करण्यासाठी पाश्चात्य देशांतल्या समाजसुधारक चळवळींचे निरीक्षण करावे, तेथल्या अनेक शास्त्रांचा स्वाध्याय का तिकडील धर्मक्रांतिकारकांची चरित्रे अभ्यासावी, यासाठी विलायतेला जाण्याचा पंडिताबाई बेत करू लागल्या.
क्रिस्ती मिशनऱ्यांची सहानुभूति
बंगाल आसामकडे असतानाच धर्माच्या बाबतीत पंडिता साशंकवादी (अग्नॉस्टिक) बनल्या असल्या तरी त्यांचा ईश्वरावरील श्रद्धा अढळ होती. तिकडे असतानाच बायबलचा त्यानी वरवर अभ्यास केला होता. पुण्यास आल्यावर तेथल्या थोरथोर हिंदी मिशनरी पंडितांच्या सहवासाने येशू क्रिस्ताच्या भूतदयाळू चरित्राचे त्याना आकर्षण वाटू लागले. पूर्वी व्याख्यान वचनांत त्या भगवद्गीतेतली वचने आधाराला घेत असत. पण मागाहून क्रिस्त-वचनांचाहि भरपूर उपयोग करू लागल्या होत्या. भाषित सद्वचन सत्यार्थ कोणाचा नि कोठला का असेना तो विश्वासाने करण्यात कसले पाप? सत्य ते सत्यच! धर्माच्या सोवळया संकुचितपणाची आवरणे त्याला कशाला हवीत? असा त्यांचा वाजवी दावा असे.
स्मृतिपुराणोक्त हिंदु धर्मावरील विश्वास उडालेले शेकडो सुधारक बंगालप्रमाणे महाराष्ट्रातहि होतेच. प्रत्येक नव्या कल्पनेचा हिरिरीने पुरस्कार करण्यात पुढे पाऊल टाकण्याची शहामत असणाऱ्या शेकडो चित्पावन मंडळीनी पूर्वीच क्रिस्ती धर्मात प्रवेश केलेला होता. एवढे साहस ज्याना जमले नाही, ते तुकारामादिकांच्या भागवत धर्माच्या सावली सावलीने जातपात निवडक अशा प्रार्थना समाजाने आणि परमहंस सभेच्या गुप्त चळवळीने, हिंदुधर्म प्रचारात आणू पहात होते. म्हणजे रमाबाईच्या धर्मविषयक खळबळीच्या हंगामात महाराष्ट्रात स्मृति पुराणोक्त वैदिक धर्माविरुद्ध उघड बंड चालू झालेले होते. ज्ञानेश्वर ज्याचा पाया आणि तुकाराम ज्याचा कळस असा
सर्वाभूतीं प्रेम । वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेद भ्रम । अमंगळ ||
असा जोरदार पुकारा करणारा भागवत धर्म पंढरपूरच्या माहात्म्या महाराष्ट्रभर शेकडो वर्षे गर्जतच असताना, त्याच तत्वावरच्या क्रीस्ती धर्माकडे विचारवंत ब्राम्हणांचा ओघ कां खेचला जावा, यांचे कित्येकांना आश्चर्य वाटण्यासारखे आहे. त्याचे समाधान थोडक्यात असे. भागवत म्हणजे मागासलेल्या ब्राम्हणेतर `लंगोट्या नि घोंगडीवाल्या` समाजाचा धर्म. ब्राम्हणादि वरिष्ठ वर्गाच्या पांढरपेशांचा त्याच्याशी काही संबंध नाही. ब्राम्हणांची कर्मे तेवढी वेदोक्त, बाकीच्यांची फक्त पुराणोक्त. या समजुतीप्रमाणेच भागवत धर्मपंथाला ब्राम्हणानी अज्जीबात वाळीत टाकले होते. रमाबाईलाहि याच कारणांमुळे त्याचा परिचय करून घेता आला नाही, तर त्यात नवल कशाचे?
शिवाय मनाला केवळ तात्विक शांति देणारा आणि माणुसकीची नुसती महान तत्वे सांगणारा धर्म रमाबाईच्या चिकित्सक प्रकृतीचे समाधान करू शकतच नव्हता. तशात, मूर्तीपूजेवरचा नि कर्मकांडावरचा त्यांचा विश्वास साफ नाहीसाच झालेला होता. नेमक्या अशा मनस्थितीत क्रिस्ती मिशनऱ्यांनी त्याना येशूच्या पंथाचा चांगुलपणा शिकवला. येशूने प्रवचित केलेली भूतदया सर्व कृत्ये मिशनरी संस्था प्रत्यक्ष कशा आचरणात आणीत आहेत, याचे दाखले दाखवून, त्या धर्माकडे त्यांची प्रवृत्ति वळवण्याचे बरेचसे काम पुण्याने साधून घेतले होते. या कामी रेवरंड नीलकण्ठ उर्फ निमाया गोरे या संस्कृत चित्पावन क्रिस्ती पंडिताने बरीच मेहनत घेतली. रमाबाईच्या विलायत गमनाचा हेतू तडीला नेण्याच्या कामी पुण्याच्या पंचहौद मिशनने द्रव्यसंचय देण्याचे कबूल केले. पण रमाबाई मोठ्या मानी, परावलंबित्वाची त्याना मोठी चीड. स्वताच्या कष्टाने पैसे मिळवूनच जाणार तर जाईन त्यानी स्त्री-धर्म नीति नावाचे एक मराठी पुस्तक लिहिले. भाषा सरळ बालबोध. सगळ्याना चटकन समजेल अशी. स्त्रियांनी आपल्या आत्मोद्धारासाठी स्वताच झगडले पाहिजे. याशिवाय त्यांची नि हिंदू समाजाची प्रगति होणार नाही. स्त्रियांनी आपले वर्तन कसे सुसंस्कृत करावे, शील कसे वाढवावे नि राखावे, धर्मभावना कशा जोपासाव्या, आपला पति मुले यांचे संगोपन करून कुटुंबसंस्था कशी चोख असावी, याविषयी त्या पुस्तकात पुष्कळ अनुभवाचे बोल लिहिले होते. जुन्या-नव्या मतांच्या अनेक विद्वानानी या पुस्तकाचे कौतुक केले. दादोवा पांडुरंग यानी शिफारस केल्यावरून मुंबई सरकारने त्याच्या सर्व प्रति मोफत वाटण्यासाठी विकत घेतल्या.
या पुस्तकाच्या रकमेवर जेमतेम आगबोटीवरचे डेकचे भाडे भरता येईल, असे पहाताच रमाबाई आपल्या छोट्या छोकरीला बरोबर घेऊन लंडन यात्रेला निघाल्या. बरोबर मिस हारफर्ड बाई होत्या. पंचहौद मिशनने थोडीशी पैशाची मदत दिली. बाईनी ती पुढे परत आल्यावर फेडली.
त्या काळी परदेशगमन हे महापातक समजण्यात येत असे. सात समुद्र ओलांडून गेला तो जातिबहिष्कृत झालाच. परत जातीत यायचे तर त्याला मोठे खर्चाचे प्रायश्चित घ्यावे लागत असे. अगदी अलिकडच्या काळात बाळ टिळक लंडनला जाऊन आले म्हणून त्यानाहि प्रायश्चित्त घ्यावेच लागले होते. रमाबाई म्हणतात: "मला देवाने प्रेरणा केली की अंगीकृत कार्य पार पाडण्यासाठी तुला अजून पुष्कळ शिकायचे आहे, पहायचे आहे, इतकी पात्रता आणायची आहे, म्हणून विलायतेला जा आणि मी निघाले."
प्रकरण ६ वे
लंडन अमेरिकेने केलेली क्रांति
लंडनला जाण्याची तयारी करीत असताना, बाईच्या प्रार्थनासमाज मित्रानी “बाई, तिकडे जाऊन क्रिस्तीविस्ती होऊ नका बरं" असे कळवळून सांगितले. “देव नेईल तिकडे जायचे मी ठरवले आहे. अजून मी काय सांगू." एवढेच उत्तर त्यानी दिले.
आगबोटीच्या प्रवासात बाईना पुष्कळ अडचणी नि त्रास भोगावा लागला. त्या काळचा विलायतेचा प्रवास म्हणजे आजच्या सारखा सुखसोयी नव्हता. इंग्लंडच्या भूमीवर पाय ठेवताच, वॅण्टेज नामक क्रिश्चन मठातून सिस्टर्सनी रमाबाईचे हार्दिक स्वागत केले. हा एक अविवाहित स्त्रियांचा भगिनी सेवा संघ होता. मिस्र हारफर्ड बाईनी पंडितेचा परिचय करून दिला. बॅण्टेज सेवा संघातच हिंदुधर्म पद्धतीने जेवणाराहाण्याची बिऱ्हाडाची सोय करण्यात आली. (जानेवारी १८८३.)
मायदेशातल्या भगिनी बांधवांची आपल्याकडे पहाण्याची शंकेखोर तुसडी वृत्ति आणि या परदेशी परकी बायांनी हरएक बाबतीत दाखवलेला आपुलकीचा जिव्हाळा यांतला भेद रमाबाईच्या मनावर पक्का ठसला. माणुसकीच्या जिव्हाळ्याचे प्रथम दर्शन त्याना येथेच झाले. मनोरमा लालन पालन पोषण सिस्टर्सनी चालवले. एक वर्षात त्या सिस्टर्सनी विषयांचे इंग्रेजी भाषेचे आणि करिस्ती धर्मतत्वांचे शिक्षण रमाबाईना दिले. जीवनाकडे पाहण्याचा त्याना एक नवाच दृष्टीकोन आढळला.
क्रिस्ती अनाथाश्रमाचे दर्शन
हवापालट करण्यासाठी वॅण्टेज सिस्टर्सनी रमाबाईना एकदा आपल्या मुख्य कार्याच्या ठिकाणी पाठवले. तेथे अनाथ, अपंग, माथी फिरलेल्या, लुल्या, पांगळ्या, रोगी, रक्तपित्या शेकडो प्रकारच्या स्त्रिया नि मुलांमुलीची जोपासना करणारे रेसक्यू होम (अनाथाश्रम) पाहाताच, आजवर मनोमन अस्पष्ट दिसणारे विश्वच त्यांच्या प्रत्यक्ष नजरेला पडले. येशू क्रिस्त ज्या भूतदयेचा नि माणुसकीचा उपदेश करीत होता, ती दया नि माणुसकी या क्रिस्ती भगिनी सर्वस्व पणाला लावून कशा आचरीत आहेत, हे पहाताच रमाबाईना गहीवर आला. त्यांच्या डोळ्यांतून आसवांचा धबधबा वाहू लागला. आपल्या नाक्षर, अनाथ, अपंग हिंदी भगिनींच्या उद्धारासाठी मलाहि असे काही करता येणार नाही का? या प्रश्नाची तिडीक मस्तकात सणाणू लागली. मोठा प्राचीन प्रतिस्मृतिपुराणोक्त हिंदुधर्म, कोटीकोटी गणतीचे त्यांचे अभिमानी. पण कोणी कोठेही मानवधर्माचे कर्तव्य करीत नाही! किती शरमेची गोष्ट! रमाबाई म्हणतात: "अधोगतीला गेलेल्या नि जात असलेल्या माझ्या हिंदी भगिनीच्या उद्धारासाठी काहीतरी केले पाहिजे हे माझ्या आयुष्यात प्रथम मला याच ठिकाणी पटले. ज्या क्रिस्ती जनांना हिंदु लोक बाटगे नि निष्ठूर समजतात, ते समाजांतून उठलेल्या नि उठवलेल्या हतभागी महिलांची किती आपुलकीने सेवा करतात बरे? अशा अवस्थेतल्या स्त्रियांविषयी माझ्या स्वदेशात एकही हिंदु कोठे काही हालचाल करीत नाही.” रमाबाईंच्या मनाने उचल खाल्ली आणि लंडनला परत येताच त्यांनी सपटंबर १८८३ रोजी वॅण्टेज पॅरिश चर्चमध्ये कॅनन बटलरच्या हस्ते आपल्या मुलीसह ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला.
रमाबाईच्या धर्मातराची बातमी हिंदुस्थानात येताच पुण्या मुंबईकडचे सगळे सनातनी नि सुधारक एकमेकांवर कोलमडू लागले. "व्हायचे अखेर झालेच, आम्ही हा तर्क केलाच होता.
अनृतं साहसं माया मूर्खत्वं अतिलोभता ।
अशौचत्वं निर्दयत्वं स्त्रीणां दोषाः स्वभावजाः ॥
शास्त्रकार म्हणत आले ते काय गाढव होते? एवढी मोठी म्हणे पण्डिता सरस्वती! गेली फुकट! माणसांतून उठली! आम्हाला मेली!" असा आक्रोश चालू झाला. `केवळ धर्मातर झाले, एवढ्यावरच तिची निंदा टवाळी करता? स्वदेशी परत आल्यावर होईल तिचे मतांतर. असा सुधारकांचा आशावाद घुमू लागला. धर्माच्या श्रद्धेचे स्थान बदलताच आमचा समाज व्यक्तीविरुद्ध पिसाटासारखा तुटून पडत असे.
संस्कृत शिकवून इंग्रेजी शिकल्या
इंग्रेजीचा विशेष (अॅडवान्स्ड) अभ्यास करण्यासाठी रमाबाई १८८४ साली चेलटनहॅम कॉलेजात गेल्या. फीचा प्रश्न उभा राहिला. प्रत्येक बाबतीत स्वावलंबन हा तर रमाबाईचा कट्टर स्वभावधर्म. तेथल्या विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवण्याचे प्रोफेसरांचे काम पत्करून, त्यानी आपल्या फीची गरज परस्पर भागवली. दोन वर्षाच्या अवधीत रमाबाईनी गणित, इतिहास, भूगोल, पदार्थविज्ञानशास्त्रादि अनेक उपयुक्त विषयांचा सखोल अभ्यास केला. इंग्रेजी भाषेतले त्यांचे प्रभुत्व पाहून अनेक इंग्रेज मित्रांनी त्यांचे जाहीर अभिनंदन केले.
अमेरिकला निघून या
लंडन येथे होत असलेल्या रमाबाईच्या धार्मिक नि बौद्धिक उत्क्रांतीचे पडसाद अमेरिकेच्या वृत्तपत्रांत नेहमी उमटतच होते. एक तरूण हिंदु विधवा सात समुद्र ओलांडून युरोपखंडात येणे, हाच मुळी एक अपूर्व चमत्कार होता. यापूर्वी पुण्याच्या आनंदीबाई जोशी ही हिंदु तरुणी अमेरिकेत उच्च वैद्यकशास्त्र अभ्यासण्यासाठी आलेलीच असल्यामुळे, रमाबाईकडे तेथल्या विद्वानांचे लक्ष साहजीकच गेले. फिलाडेलफिया येथील मेडिकल कॉलेजच्या महाशया डॉक्टर राशेल बांडले यांचे रमाबाईना १८८५ च्या जानेवारीत अगत्याचे पत्र आले. "सन १८८६ च्या मार्च महिन्यात आपल्या देशभगिनी आनंदीबाई जोशी याना डॉक्टर ऑफ मेडिसिन (एम. डी.) पदवी देण्याचा जाहीर समारंभ होणार आहे. तो पहाण्यासाठी आपण निघून यावे." असे ते निमंत्रण होते, " प्रथमतः मी काही विशेष कारणासाठी त्यांचे बोलवणे स्वीकारले नाही. पण त्यानी पुन्हा स्वतः आणि सौ. आनंदी बाई जोशी आणि रा. गोपाळराव जोशी ह्यांकडून पत्रे लिहवून मला अमेरिकित जाण्याचा आग्रह केला. तेव्हा मला किती अडचणी असल्या तरी माझ्याने त्यांचे बोलावणे नाकारवेना. कारण एकतर बॉडलेबाई परजातीय आणि परधर्मी असूनही त्या हिंदु स्त्रियांविषयी जितका कळवळा बाळगतात हे त्यांचे आम्हांवर मोठे उपकार आहेत. दुसरे असे की वैद्यकीसारखा कठीण विषय शिकून पदवी मिळविली, असे साऱ्या हिंदु स्त्रियांपैकी आनंदीबाई जोशी यांचेच पहिले उदाहरण आहे. तेव्हा त्यांस पदवी मिळण्याचा आनंदकारक समारंभ पाहण्यासाठी सर्वशक्तिमान परमेश्वरावर सर्व भार टाकून मी माझ्या कन्येसह इ. स. १८८६ सालांतील फेब्रुआरी महिन्याच्या सतराव्या तारखेस ‘ब्रिटिश प्रिन्सेस` नांवाच्या तारवांत बसून, इंग्लडांतील लिवरपूलचे बंदराहून अमेरिकेकडे प्रयाण केले.” या वेळी मनोरमा ४॥ वर्षाची होती.
हिंदी स्त्रियांच्या उद्धारासाठी शिक्षणाचा अट्टहास करणाऱ्या रमाबाईना आनंदीबाई जोशी यांचा एम. डी. पदवीदान समारंभ पाहून आनंदाचे भरते आले. त्या लिहितात “ इ. स. १८८६ तील मार्च महिन्याच्या ११ व्या तारखेस सकाळी अकरा वाजता आम्ही फिलाडेलफिया शहरांतील अकॉडेमी आॅफ सायन्स` नांवाचे सभागृहात गेलो. तेथे वैद्यविद्यालयात शिकून परीक्क्षोत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीस पदवी देण्यास समारंभ पाहण्याकरता स्त्रीपुरुष मिळून सुमारे ३००० । ३५०० मंडळी जमली होती. याच दिवशी आमची देशभगिनी सौ. आनंदीबाई जोशी यांस वैद्यकीची पदवी मिळाली. या समारंभाचा देखावा फारच आनंदकारक वाटला. कारण आनंदीबाई ही पहिली हिंदू स्त्री वैद्यकी शिकून पदवी पावली आहे. तशात ही बाई आमच्या आप्तानपैकी म्हणून आम्हाला तिचा फार अभिमान वाटतो. "
पंडितेची अमेरिकेतली कामगिरी
अमेरिकेत पाऊल टाकताच पंडिता रमाबाई तेथील मोठमोठ्या प्रोफेसरांच्या समाजसुधारकांच्या आणि राजकारणी मुत्सद्दी लोकांच्या कौतुकाचे आकर्षण बनल्या. तेथील हवा छोट्या मनोरमेला मानवे ना, म्हणून तिला त्या लंडनला बॅण्टेज मठाच्या सिस्टर्सकडे पाठवून दिली. आपणहि वैद्यकशास्त्र शिकावे असे त्याना वाटले. पण ते जमले नाही. त्यानी शिशु-शिक्षण फ्रोवेलची किंडरगार्टन पद्धति अभ्यासली आणि तिच्या पद्धतीने मुलांमुलींच्या शिक्षणक्रमाची काही मराठी पुस्तके लिहून तयार केली. ती छापायची म्हणून आला पैशाचा प्रश्न. विलायतेला निघण्यासाठी त्यानी जसे `स्त्री धर्मनीति’ पुस्तक लिहून तो खर्च भागवला, त्याच धोरणाने त्यानी `हाय कास्ट वूमन: उच्चवर्णीय हिंदु महिला’ नांवाचे एक इंग्रजी पुस्तक लिहून अमेरिकेत प्रसिद्ध केले. पेनसिल्वेनिया महिला वैद्यक पाठशाळेच्या डीन महाशया डॉ. राशेल बॉडले बाईनी आपल्या प्रस्तावनेत लिहिले की "या पुस्तकाच्या प्रत्येक पानापानावर आत्यंतिक दुखाचे अश्रू मी गाळले आहेत." ‘हजारो वर्षाच्या हिंदी अबलांच्या मुस्कटदाबीवरचा पडदा दूर झाला.` " लाखो लाखो बाल आणि तरुण विधवा आणि निरपराध बालके या भरतभूमीत लिहिता बोलता येणार नाहीत अशा हालअपेष्ठांत चेचली ठेचली ठार मारली जात आहेत. पण आजवर त्यांचे दुक्खविमोचन करणारा एकहि तत्वज्ञ किंवा महात्मा धैर्याने पुढे आलेला नाही असे एका ठिकाणी रमाबाई तळमळीनं लिहितात. लग्नाच्या बायकोला नवऱ्याने सासू सासऱ्याने किंवा नणदा दिरानी मारली भाजली लासली, तर इतराना किंवा सरकारलाहि त्या भानगडीत तोंड घालण्याचा अधिकार नाही. मातापित्याच्या बरोबर तीर्थ-यात्रेच्या पायपिटीत यमुना नदीच्या किनारी असताना, एका अवघ्या नऊ वर्षाच्या बालपत्नीला तिचा नवरा ढोरा सारखा मारीत होता. "त्या अभागी असहाय जीवाच्या कर्कश किंकाळ्या माझ्या काळजांत इतक्या खोलवर घुसल्या की आज तीस वर्षे झाली त्या गोष्टीला तरी त्या आजहि माझ्या कानांना स्पष्ट ऐकू येत आहेत." असे रमाबाईनी दाखल्यादाखल लिहिले आहे. पुढे त्या म्हणतात " असले जागोजागचे हृदयविदारक देखावे पाहूनच, या यमयातनांतून माझ्या भगिनी वर्गाची मुक्तता करण्याचे शक्य ते प्रयत्न करण्याचे माझ्या मनाने घेतले."
प्रोफेसर मंक्स मुल्लर क्रिश्चियानिया येथील ओरिएण्टल कांग्रेसमध्ये बोलत असताना पंडिता रमाबाईला अनुलक्षून म्हणाले `हिंदुस्थानातील सतीची अमानुष राक्षसी रूढी कायमची बंद पाडणाऱ्या राममोहन रॉय नंतर एक शतकानी पंडिता रमाबाई याच पहिल्या महिलोद्धारक मला दिसतात. पंडिताच्या रूपाने भारमाता यौवन परिपूर्ण तेजाने पुन्हा अवरत आहे. त्यांचे शब्द जलाल नि कठोर असले तरी ते भारताच्या भविष्यासाठी भूतकालाचा निषेध करतात, एवढेच. बाईंचे हृदय निर्मळ असून त्या एकट्या भरत खंडाच्या नव्हे तर अखिल जागतिक मानवतेच्या स्नेही आहेत."
"अज्ञान आणि धर्मभोळेपणा, विनयाच्या फाजील कल्पना नि भेदरटपणा मुळेच माझ्या भारतीय भगिनी घरोघर कठोर गुलामगिरीचे कष्ट भोगीत फुकट जात आहेत. परमेश्वराने निर्माण केलेल्या या सृष्टीत काय काय चमत्कार भरले आहेत? किती सौंदर्य भरले आहे? ते कोणीतरी त्यांना आरोळ्या मारून सांगितले पाहिजे, दाखवले पाहिजे. त्या शिवाय त्यांची अज्ञाननिद्रा संपणार नाही. स्त्रियानी वाचायला हातात पुस्तक नि लिहायला लेखणी घेतली का त्यांचा नवरा मरतो. किती चमत्कारीक भोळसट पणा हा! हा समूळ घालवायला काहीतरी चमत्कारच घडला पाहिजे, किंवा कोणीतरी घडवला पाहिजे. माझी बालंबाल खात्री आहे का असा चमत्कार या दहा वर्षातच हिंदुस्थानात घडणार आहे.” पंडिता रमाबाईचे अमेरिकेतले हे उद्गार आज संपूर्णपणे हिंदुस्थानात सत्य झाल्याचे आपण पाहातच आहोत.
‘रमाबाई असोसियेशन` ची स्थापना
रमाबाईंच्या ‘उच्चवर्णीय हिंदू महिला’ पुस्तकाने अमेरीका खंडात फार मोठे विचारांचे तुफान उठवले. त्यानी अमेरिका नि कानडा मध्ये हजारो मैलांचा दौरा काढला. तेथले लोकमत जागृत करीत असताना या प्रजासत्ताक राज्यव्यवस्थेविषयी लोकस्थितीविषयी आणि औद्योगिक प्रगती विषयक बारीक तपशीलांची टिपणे तयार केली आणि त्यांवरून त्यानी युनायटेड स्टेट्सची लोकस्थिति आणि प्रवासवृत्त नावाचा एक मराठी ग्रंथ तेथेच असताना लिहायला घेतला. तो पुढे हिंदुस्थानात परत आल्यावर सन १८८९ साली येथे प्रसिद्ध केला.
रमाबाईंच्या अबला दास्य-विमोचनाच्या प्रश्नाने खळबळलेले शेकडो विचारवंत अमेरिकन स्त्री पुरुष एकत्र जमले आणि त्यानी "हिंदुस्थानातील उच्चवर्णीय हिंदु बालविधवांसाठी सर्व तऱ्हेचे सहाय देणारी" रमाबाई असोशियेशन संस्था दि. १३ दिसेम्बर सन १८८७ रोजी बोस्टन नगरात स्थापन केली. शेकडो डॉलरांच्या वर्गण्या जमा झाल्या आणि दहा वर्षेपर्यंत हिंदुस्थानात विधवा विमोचक आश्रमाचे काम बिनधोक चालेल, एवढे द्रव्यसहाय्य सालोसाल पुरविण्याची तरतूद करण्यात आली. पंडितेचा संकेत आणि निर्धार फलदायी झाला.
प्रथम त्या पाताळभूमीत आल्या तेव्हा सर्वस्वी निराधारच होत्या. मनात हेतू पुष्कळ होते. पण त्यांचे भविष्य त्यांच्या अटकळीत येण्याइतकी कसली अनुकूल स्थिति त्याना दिसत नव्हती. पण सन १८८८ च्या नवंबर महिन्यात सान प्रानसिस्कोहून चीन जपान मार्गाने हिंदुस्थानात परत यायला निघाल्या, तेव्हा त्यांच्या आजूबाजूला शेकडो हजारो नामवंत अमेरिकन आणि इंग्लिश स्त्री पुरुषांची सक्रीय सहानुभूती आणि हुकमी पाठिंबा उभा होता.
पासिफिक महासागर ओलांडून स्वदेशी येत असताना, रमाबाई काही दिवस जपान देशातली लोकस्थिति पहाण्यासाठी उतरल्या. तेथल्या स्त्रियाचे स्वावलंबी आत्मोद्धाराचे विविध यत्न पाहून त्याना मोठा उत्साह आला. जपानात घडत आहे, ते माझ्या देशात घडणारच घडणार, अशा उमेदीने त्या सन १८८९ च्या फेब्रूवारी महिन्यात कलकत्ता बंदरात येऊन दाखल झाल्या.
प्रकरण ७ वे
शारदा सदनाचे कार्य
जपानमार्गे रमाबाई हिंदुस्थानात येण्याच्या सुमारासच छोटी मनोरमा लंडनहून पुण्याच्या पंचहौद मिशनमध्ये येऊन दाखल झाली होती. पंडिताबाई थेट पुण्याला आल्या. पूर्वीचा पुण्याचा अनुभव जमेला धरून, माधवराव रानडे, काशीनाथपंत तेलंग, डॉ. भांडारकर आणि नारायणराव चंदावरकर प्रभृति सुधारक मंडळीच्या शिफारशीवरून त्यानी ठरवलेल्या आपल्या अनाथ महिलोद्धाराच्या कार्याच्या प्रारंभासाठी अमेदशील(कॉस्मोपॉलिटन) मुंबई नगरच पसंत केले. दि. १ मार्च सन १८८९ रोजी चौपाटीवर एक प्रशस्त बंगला घेवून तेथे शारदा सदनाची स्थापना केली. योगायोग पहा. शारदा सदन म्हणजे देवी सरस्वतीचे वसतिस्थान. येथे अनाथ अबलाना ज्ञानामृत पाजून त्याना साक्षर ज्ञानवंत आणि सबला करण्याचे ठिकाण, या अर्थाने हे नांव देण्यात आले होते. पण पहिलीच हिंदू तरुणी (ही मात्र विधवा नव्हती) सदनात आली, तिचे नांव शारदाच होते. थोड्याच दिवसांत अनाथ बालविधवा सदनात शिक्षणासाठी येऊ लागल्या. सहाच महिन्यात जेवूनखावून रहाणाऱ्या ५, दिवसा फक्त अभ्यासासाठी येणाऱ्या ३ आणि इतर मिळून २५ महिला विद्यार्थिनीची संख्या झाली.
`येशू क्रिस्तावर श्रद्धा असणाऱ्या क्रिस्ती धर्माची मी अनुयायी आहे.` हे सत्य रमाबाईनी केव्हाहि लपवून छपवून ठेवले नाही. "धर्मभावनेने जरी मी क्रिस्ती असले, तरी सदनातील हिंदू महिलांवर या धर्माची सक्ती मुळीच करण्यात येणार नाही. त्यानी आपल्या हिंदु धर्माचा तुळशी पूजा, पोथी पारायण, उपासतापास, व्रत वैकल्ये सदनात खुशाल मोकळ्या मनाने करावी. बायबल आणि वेदग्रंथ येथे एकाच पाटावर ठेवायला माझी काही हरकत नाही." असा स्पष्ट जाहीर खुलासा केला. धर्माने बाई जरी क्रिस्ती असली तरी अनाथ महिलोद्धाराचे कार्य हिंदु समाजाला आवश्यक आणि हितकारक आहे. इतर कोणी ते करीत नाही, पंडिताबाई अढळ निर्धाराने ते करत आहेत, तेव्हा त्याना उत्तेजन द्यायला काही हरकत नाही, अशा उदार भावनेने सुधारक पुढारी सदनाच्या व्यवस्थापक मंडळात सामील झाले.
बाटगी, माणसांतून उठलेली म्हणून पुण्यातल्या सनातनी समाजाने जिची मनस्वी हेळणा केली, तीच बाई आता अमेरिकन क्रिस्ती मिशनऱ्यांच्या सांपत्तिक पाठिंब्याने आमच्या बाल किंवा तरुण विधवांचा उद्धार करायला एक आश्रम थाटते, हा मिशनरी काव्याचा बाटवाबाटवीचा एक सापळा आहे, हिंदू धर्मावर ह एक मोठे गंडातर आहे. त्याचा सर्व हिंदू धर्माभिमान्यानी कस्सून विरोध केला पाहिजे, अशा टिळकांच्या केसरीच्या हाकाट्या चालू झाल्या. रमाबाईना टिळकानी कट्टर विरोध केला, तरी केसरीचे इंग्रजी `मराठा` साप्ताहीक त्याचे संपादक वासुदेवराव केळकर यानी कडकडीत इशारा दिला की "शारदा सदन हे सर्वस्वी पुराणमतवादी पद्धतीने चालावे अशी फुकट्या हिंदु समाजाने अपेक्षा तरी कशी करावी? त्यांतल्यापेक्षा अधिक जुन्या पद्धतीचे शिक्षण पाहिजे असल्यास त्यांनी स्वता वर्गणी जमवून स्वतंत्र संस्था का काढू नये? सरकारी शाळेत जितक्या बेताची धार्मिक दृष्टया तटस्थ वृत्ति राहू शकते तितकी पंडिता रमाबाईची राहिली म्हणजे बस झाले."
शारदा सदनाविषयी सनातनी आणि सुधारक यांचा वर्तमानपत्री वाद विवाद पुष्कळच अटीतटीने चालला असताना, सन १८९० साली पंडिता रमाबाईंनी पुण्यास एक नवी सोयीस्कर इमारत बांधून तेथे आपले शारदा सदन नेले. `वैरियाच्या उरावरी पाय द्यावा` असाच काहीसा धाडसाचा हा प्रयोग झाला. १८९० च्या जुलई महिन्यात या इमारतीचा अनावरण विधि थाटामाटाने झाला. मुंबई पुण्याची शेकडो मोठमोठी पुढारी मंडळी आणि स्त्रिया समारंभाला आल्या होत्या. इमारतीचे निरनिराळे भाग त्याना दाखवीत असताना
“या सर्व चांगल्या सुसज्ज खोल्या शिक्षकिणीसाठी नाहीत राखून ठेवलेल्या. दिवाणखान्यासकट हव्या त्या ठिकाणी जाण्या येण्याची रहाण्याची माझ्या विद्यार्थिनीना पूर्ण मुभा आहे. हे सारे सदन नि मुखसोयी त्यांच्याचसाठी आहेत. कौटुंबीक नि सामाजीक छळवादाने ज्यांचे जिणे नरकतुल्य झाले आहे, अशा शेकडो अनाथ नि अपंग भगिनीना येथे प्रेम नि माणुसकीचा जिव्हाळा मला प्रत्यक्ष पटवून द्यायचा आहे. चित्रे नि पुस्तके दाखवून जगाची त्यांना माहिती द्यायची आहे. बागेत हिंडताना देवाच्या अद्भुत करणीचे त्यानी कौतुक करावे आणि इमारतीच्या छपरावर ठेवलेल्या सूक्ष्मदर्शक दुर्बिणीतून सूक्ष्म प्राण्यांचे नि आकाशस्थ तारकांचे निरीक्षण करावे, असे माझ्या मनात फार आहे."
असा खुलासा केला. घरगुति जाचाना कंटाळून आलेल्या आणि आणलेल्या चाळीस विधवा या वेळी सदनात शिक्षण घेऊन रहात होत्या. बाहेर सनातनी विरोधाचे, भलभलत्या आरोपांचे आणि अश्लील निंदेचे तुफान वर्तमानपत्रांतून चाललेच होते आणि पंडिताबाई मेरुपर्वताइतक्या धैर्याने सदनातील विधवांचे पालन पोषण शिक्षणाचे कार्य करीत होत्या.
शारदा सदन म्हणजे माहेरघर
पुणे येथील शारदा सदनातली व्यवस्था नि वागणूक आश्रमस्थ मुलीना अगदी माहेर घरासारखी वाटत असे. तेथल्या एका तरुणीने या माहेरघरांचे केलेले वर्णन पहा: "काय त्या बंगल्याची शोभा नि काय तो सुंदर फुलाफळानी डवरलेला आमचा बगिचा! हवे तिकडे मोकाट फिरण्याची आम्हा मुभा. दिवाणखाना देखील आमची बैठकीची जागा. सुंदर कोचा खुर्च्याव बसून गप्पा माराव्या. बागेत जाऊन जाईजुईमोगरा चमेली बकुळी मधुमालतीच्या वेण्या गुंफून आमच्या केशकलापांवर घालाव्या. बाई आम्हाला फुले पक्षांची नि झाडांची माहिती देत दुर्बिणीतून त्यांचे निरीक्षण परीक्षण करायला शिकवीत. काय ते आमचे लाड! अशा सुंदर प्रेमळ वातावरणात आपले दिवस घालवायला कोण बालविधवा येणार नाही बरे? चित्रे पुस्तकांचा संचय तर काही विचारूच नका. पंडिताबाई रोज पहाटे उठून आम्हाला आगाशीवर न्यायच्या. नक्षत्रे तारे यांची नावे सांगून माहिती द्यायच्या. जेवणाखाणाचा थाट पाहून बाहेरचे लोक म्हणायचे की `रमाबाई आपल्या मुलीना दुधातुपात लोळवते’. कधी कशाची तूट म्हणून नाहीच. सणावारी मेजवान्यांचा थाट म्हणजे श्रीमंती. बाई स्वतः स्वयंपाकात फारच सुगरण असत. लोणची पापड, कुरडया, शेवाया मे महिन्यांत व्हायच्याच. पेढे बर्फी लाडू करंज्या जिलब्या कापण्या चकोल्या शेव चिवडा साखरभात नारळीभात मोदक, एक ना दोन, शेकडो पक्वान्ने सणावाराला तयार होत असत. ती सर्व बाईनी सांगावी नि आम्ही मुलीनी हांसत खिदळत बिनचूक तयार करावी. आमच्या कोठारात दीडशे तऱ्हेतऱ्हेच्या लोणच्यांच्या बरण्या सहा सात साजूक तुपाचे हांडे, तांदूळ डाळ गव्हाची आठ नऊशे पोती साखरेची पिंपे नेहमी खच्चून असायची. स्वयंपाकाप्रमाणेच शिवणकाम कशिदाकाम यांचेहि शिक्षण बाई आम्हाला हळुवारपणे द्यायच्या.”
रमाबाईची दिनचर्या
लंदन अमेरिकेसारख्या फॅशनबाज देशांत रमाबाई राहून फिरून आल्या, पण त्यांनी पतिनिधनानंतर साधे पांढरे पातळ, लांब बाह्यांचा पांढरा सदरा असा जो वेष पत्करला तो त्या देशांत आणि आमरण कायम ठेवला. ` न खरे म्हणजे खरे नव्हेत ते नखरे` अशी नखऱ्यांची त्यांनी सुटसुटीत व्याख्या केली होती. त्यांची असली साधी स्वच्छ रहाणी पाहून अमेरिकन बाया चकित होत. अतिशय मांसाहारामुळे आणि नियमित दांत स्वच्छ ठेवण्याच्या निष्काळजीपणामुळे, अमेरिकन बायांचे दांत नेहमी किटके नि किटाळ असायचे. पुष्कळ बाया तर तरुणपणीच कृत्रिम दातांच्या कवळ्याच बसवून मिरवायच्या. फॅशनच होती ती एक. रमाबाईंचे मोत्यांसारखे स्वच्छ दांत पाहून ‘कोणत्या हो दंतवैद्याने इतकी सुंदर कवळी तुम्हाला बनवून दिली?" असे पुष्कळ अमेरिकन बाया त्यांना विचारायच्या. `माझे दांत नैसर्गिकच आहेत’ असे सांगताच त्या फणकाऱ्याने म्हणायच्या ‘अशक्य अशक्य’. अखेर एका वृद्ध अमेरिकन बाईने रमाबाईचे तोंड वासून, सारे दांत दाढा हालवून खात्री करून घेतली, तेव्हा आजूबाजूच्या अमेरिकन तरुणीना आश्चर्याचा मोठाच धक्का बसला.
रमाबाईंचे आश्रमीय जीवन एका विद्यार्थीनिने लिहिले आहे. ती म्हणते: “रमाबाईना स्वताचे खातेपोते म्हणून काहीच नव्हते. जे काही करायचे सवरायचे ते सारे सदनातल्या मुलीसाठी. आपण स्वत: निर्लेप. दोन तीन रुपयेवाली पांढरी शुभ्र पातळे नि चोळ्या, पायांत एक साधारण पुणेरी जोडा, उन्हासाठी एक हलकीशी हिरवी छत्री, हांतात सदानकदा एक कातडी पाकीट, त्यात चष्मा, दोन फाउण्टन पेन्स, दोन शिसपेन्सिली एक रबराचा तुकडा, एवढीच त्यांची इस्टेट. स्नान, शास्त्रवाचन प्रार्थना यांसाठी ३-४ तास खर्ची पडायचे तेवढेच त्यांचे. बाकी पहाटे ४ वाजेपासून तो मध्यरात्रीपर्यंत आम्हा मुलीच्या शिक्षणासाठी काम काम. वाटेल तेव्हा जा, वाटेल त्या कामात बाई गढलेल्या असोत, त्या आमच्याशी वाटेल तितका वेळ खेळत उपदेश करीत बसायच्या. त्यांना घाई कधीच नसे. ‘जा मागाहून ये, आता वेळ नाही’, असे शब्द आम्ही कधी ऐकले नाहीत. मुलीनी अगदी सभ्यपणाने वागावे. भांग सरळ, पदर ठाकठीक पोषाख साधा असावा, छानछुकी असू नये किंवा खिदळू नये. वडील जनांस मान द्यावा. विद्याभ्यासात गर्क नि पडेल त्या कामाला तत्पर असावे हेच त्यांचे आम्हाला शिक्षण असे.”
आई बापानी, सासू सासऱ्यानी, नातलगानी आणि समाजाने चांडाळ, राक्षसीण म्हणून निर्दयपणाने धिक्कारलेल्या आणि माणसांतून उठवलेल्या या पांढरपेशा समाजांतील अभागी बालविधवाना इतक्या प्रेम जिव्हाळ्याने नि आपुलकीने वागवणारी पंडिता रमाबाई केवळ माताच काय पुनर्जन्म देणारी देवता वाटल्यास नवल ते कशाचे? त्याना शारदा सदनच आपले माहेरघर आजहि वाटत आहे याचे कारण हेच.
अखेर विरोधाचा ज्वालामुखी भडकला
सदनात येणाऱ्या मुलीना धर्माचरणाची मोकळीक होती. सोवळे ओवळे उपासतापास, स्नान पूजा अर्चा इत्यादि नित्यनेम यांची जशी मुलीना संपूर्ण मोकळीक आहे, तशी मलाहि माझ्या क्रिश्चन धर्मपंथाप्रमाणे बायबल वाचून प्रार्थना विधि करण्याची मोकळीक असलीच पाहिजे. क्रिस्ती धर्माची दीक्षा घेण्याबद्दल कोणाला काही आग्रह करण्यात येणार नाही, तसे शिक्षण देण्यात येणार नाही, अशी जाहीर हमी रमाबाईनी घेतलीच होती.
रोज त्रिकाळ रमाबाई आपल्या ९-१० वर्षाच्या मनोरमा कन्येला बरोबर घेऊन एका स्वतंत्र खोलीत प्रार्थना नि बायबल वाचन श्रद्धेने करत असत. आधीच त्यानी सर्व मुलींच्या हृदयात मातृवत् आदराचे स्थान मिळवले होतेच. ही आपली आई रोज भक्तीच्या उमाळ्याने देवाची कशी प्रार्थना करते, इकडे मुलींचे लक्ष गेल्याशिवाय रहाणारच कसे? प्रथम प्रथम दरवाजाआडून त्या तो प्रार्थनेचा सोहळा नि प्रार्थना गीतांचे गायन पहात ऐकत. दरवाजा उघडाच असे. नंतर मुली थोडथोड्या जवळ येथून उभे राहू लागल्या. पुढे बसू लागल्या. गीतेहि गाऊ लागल्या. येशूच्या प्रार्थनेत तल्लीन होऊ लागल्या. रमाबाईचा तो स्वच्छ पांढरा पोशाख, त्यांचे गोड गळ्याचे प्रार्थना-संगीत, भक्तिभावाने पाणाळलेले त्यांचे ते डोळे आणि देवाला आळविण्यासाठी एकतानतेने त्यानी मारलेल्या हाका, यांचा त्या मुलींवर काही परिणाम झाला नसता तरच ते मोठे आश्चर्य होते.
श्रद्धेचा प्रश्न फार गूढ आहे. कोणाची कशावर श्रद्धा बसेल, त्याचा नेम नसतो. अग्निदेवाची उपासना करणारे कितीतरी पारशी हिंदू देवांची नि संतांची उपासना करणारे आहेत. शेकडो हिंदू मुसलमान पिराना नवस करतात आणि मुस्लिम संतांचे भक्त बनतात. पोर्चुगीज अंमलात अत्याचाराने बाटवलेले कित्येक क्रिस्ती समाज आजहि स्थानिक पालक फादरांची मुर्वत राखण्यासाठी, `बावतीस ( बाप्तिस्मा), लगीन आणि मरतिक` तीन विधि क्रिश्चन विधीने करून, शिवाय मूळ घराण्यातले हिंदू कुळधर्म खुशाल उघडपणे करतातच.
झाले, काही दिवसानी कित्येक मुलीनी ‘आम्हाला क्रिस्ति धर्माचा बाप्तिस्मा द्या` अशी रमाबाईकडे मागणी केली. ही बातमी बाहेर फुटताच सनातन्यांच्या छावण्यांत एकच हलकल्लोळ उडाला. रानडे भांडारकर तेलंग चंदावरकरांसारखे सुधारकहि घाबरले. रमाबाईनी आपले वचन मोडले, असा हि ओरडा करू लागले. महाराष्ट्रातली सगळी हिंदुधर्मानिमानी आणि सनातनी वर्तमानपत्रे रमाबाईवर जळजळीत आग ओकू लागली. घरोघर दारोदार चव्हाट्यावर हा एकच विषय जो तो आपल्या परीने वादविवाद करू लागला. पुणे शहरातल्या अनेक लोकानी आपापल्या सुना मुली सदनातून झपाटून घरी नेल्या. जाताना त्या सारखा टाहो फोडीत. कित्येकीना तर त्यांच्या पालकानी लाजलज्जा गुंडाळून ढोरासारख्या बडवीत ओढीत नेल्या. ६०-७० मुलींपैकी अवघ्या १५ मुली काय त्या सदनात राहिल्या. ज्याना बळजोराने नेण्यात आले, त्यापैकी पुष्कळ थोड्याच दिवसानी आपणहून सदनात परत आल्या आणि `आम्ही वयात आलेल्या (मेजर) आहोत, आमचे सुख दुःख आम्हाला कळते,’ अशा मैजिस्ट्रेटपुढे जबान्या देऊन सदनात राहिल्या. पुणे शहरात रमाबाईच्या निंदेने भयंकर उग्र रूप धारण केले. घाणेरड्या शिव्यागाळीनी भरलेल्या पत्रांचे रोज ढीग येऊ लागले.
रमाबाईच्या ठिकाणी दुसरी कोणी बाई असती तर त्या विरोधाला तोंड देता देता वेडी झाली असती किंवा सदनाचा उद्योग गुंडाळून स्वस्थ बसली असती. पण धन्य त्या पंडिता सरस्वतीची! तिचा आपल्या कार्यावरचा विश्वास दुर्दम्य होता. ईश्वरी प्रसादावर तिची अढळ श्रद्धा होती. हिंदु समाजातील अनाथ अबलांचा आणि विधवांचा कौटुंबिक धार्मिक नि सामाजिक छळवाद समूळ नष्ट झालाच पाहिजे आणि तो मीच करणार, परमेश्वर माझ्या हातून हे कठीण काम करवणार, हा त्यांचा आत्मविश्वासच क्षणोक्षणी उफळत होता. खवळलेल्या लोकमताला भिऊन रानडे तेलंग प्रभृती सहायकानी शारदा सदनाच्या व्यवस्थापक मंडळाचे राजीनामे दिले, "काही हरकत नाही. सगळा हिंदुसमाजच काय, पण सगळा हिंदुस्थान देश, सगळं जग माझ्या विरोधाला उभे राहिले तरीहि अबलोद्धाराचे निश्चित कार्य तडीला नेणार.” इतक्या कडव्या निर्धाराने रमाबाई, आजूबाजूला माजलेल्या लोकक्षोभाच्या अंधारातून भविष्याच्या किरणांकडे टक लावून बसल्या.
प्रकरण ८ वे
तोडिला तरु फुटे आणखी भरानें
हव्या त्या परिस्थितीत चित्ताची एकाग्रता भक्कम ठेवणे हा रमाबाईंच्या स्वभावधर्मातला एक विशेषच होता. हाती घेतलेल्या कार्याला चोहोकडून कट्टर विरोध चालू असतानाच, त्या कृष्णा तुंगेच्या उगमाजवळ आपल्या माता पित्याने पुनित केलेल्या गंगामूळ आश्रमाच्या जागेला भेट द्यायला निघून गेल्या. तिचे दर्शन होता, तो जुना इतिहास यांच्या डोळ्यापुढे साक्षात् उभा राहिला. तत्वनिष्ठेसाठी आपल्या जन्मदात्यानी अनंत हालअपेष्टा, कठोर लोकनिंदा सहन केली, पण त्यांची ध्येयावरील श्रद्धाकधी चळली ढळली नाही. मलाहि त्याच कठोर मार्गाने गेले पाहिजे, हा मूक संदेश घेवून रमाबाई लहानमोठी गांवे फिरत फिरत पुण्याला परत आल्या.
"माणुसकीला मुकलेल्या किंवा मुकवलेल्या अनाथ अबलांनी निःसंशय मजकडे यावे, मी त्यांचे जिणे सुखाचे करीन." असा जाहीर पुकारा करीत रमाबाई गावोगांव व्याख्याने प्रवचने देत फिरल्या. त्याचा परिणाम होऊन, क्रूरपणाने वागवलेल्या पुष्कळ विधवा त्यांच्याबरोबर पुण्यास आल्या. एका विधवेची कहाणी ऐका. छपराच्या वाशाला टांगून तिला घोडी देण्यात आली होती. खाली उडी टाकून तिने आपली सुटका करून घेऊ नये, म्हणून खाली जमिनीवर काटेरी फांद्या नि रखरखते निखारे पसरून ठेवलेले होते. या अभागिनीची सुटका रमाबाईनी मोठ्या हिकमतीने केली. तिच्या सासूला नि एका नातेवाईकाला `आधी आमची शाळा तर पहायला चला, मग काय ते ठरवा.` असे पटवून, त्या विधवेसह त्याना पुण्यास आणले. काही आठवड्यानंतर त्या तरुणीचा आपल्यावर विश्वास बसला असे पाहून, आणि येथे मी खुशाल एकटी राहीन, असे तिचे वचन घेतल्यावर, रमाबाईनी त्या सासूला नि नातेवाईकाला घरी परत जायला सांगितले. `तुमची सून वयात आलेली आहे, तेव्हा तिच्या मनाविरुद्ध तुम्हाला कायद्याने काहीहि बळजोरी करता येणार नाही" असे बजावून, त्या लटांबराला हुसकावून दिले. ही तरुणी रमाबाईच्या कार्यात पुढे मोठी कार्यकर्ता म्हणून उपयोगी पडली.
दुसरी एक कहाणी अशीच संतापजनक आहे. चाळीस वर्षानी मोठा असलेल्या पुरुषाशी एका पांच वर्षे वयाच्या मुलीचा विवाह झाला होता. सहाव्या वर्षीच नवरा मेला नि ती विधवा झाली. तिचा दीर होता खाणावळवाला. याने तिला अर्धा मैल दूर असलेल्या विहिरीचे पाणी काढून आणायच्या कामाला जुंपले. कडकडीत उन्हात पाय पोळताहेत आणि डोक्यावर पाण्याने भरलेला मोठा हंडा, कडेवर एक घागर आणि हातांत एक बालदी, अशा पाणी भरण्याच्या खेपा तिला सारख्या कराव्या लागत. जरा कुठे थोडा वेळ थांबली, उशीर झाला का तो नराधम तिला मारझोड करायचा. उपाशी ठेवायचा. रमाबाईनी तिला पाहिली तेव्हा ती अकरा वर्षाची होती. त्यानी तिला उपदेश केला. संरक्षणाची हमी दिली. तिचा आपल्यावर विश्वास बसल्याचे पाहून, तिला मुसलमान मुलाचा वेष देऊन (कारण नवरा मरताच तिचे केशवपन झालेले होतेच.) पुण्यास आणली. सदनात आल्यावर ती मुलगी चांगली शिकली, गुणवान निपजली, एका क्रिश्चन तरुणाशी रमाबाईनी तिचा विवाह करून संसारात बसवली.
महाराष्ट्राच्या समाज-नैतिक जीवनात जिच्या पुनरुज्जीवनाने एक उज्ज्वल इतिहासाचे पान लिहीले गेले, अशा एका ब्राम्हण विद्यार्थिनीची कहाणी सांगतो. ही विकेशा बालविधवाच होती. तिचा व्हायचा तो छळवाद झालेला होता. शारदा सदनात चार वर्षे ती आपला हिंदु धर्माचा आचार सांभाळून शिकत रहात होती. रमाबाईने तिचा एका पदवीधर सच्छील ब्राम्हण विधुराशी पुनर्विवाह लाऊन दिला. पुण्यात या पुनर्विवाहित जोडप्याचा समाजाकडून मनस्वी छळ झाला, हे सांगायला नकोच. अनेक नामवंर शीलवंत विद्वान पुत्रांची माता आणि शेकडो हिंदु विधवांची उद्धारक म्हणून ती महिला आज घडिलाहि आपल्या आंतर्राष्ट्रीय लौकिकाच्या पतिराजासोबत महिलोद्धाराचे काम अखंड करीत आहे. ओळखलीत का कोण ती? महान धोंडेपंत कर्वे यांच्या पत्नी सौ. आनंदिबाई कर्वे.
रमाबाईच्या चरित्रातल्या विधवोद्धाराच्या अशा किती तरी रोमहर्षक कथा सांगता येतील. हिंदुस्थान सोडून द्या, एकट्या महाराष्ट्रापुरतेच बोलायचे तर आमच्या तत्कालीन पूर्वजांनी समाजधर्माच्या किंवा धर्मशास्त्राच्या मुर्वती साठी बाल किंवा तरूण विधवांच्या केलेल्या राक्षसी छळांचे परिणाम आणि त्या हजारो असहाय निष्पाप जीवांचे तळतळाटाचे शापच आमच्या आजच्या अनेक राष्ट्रीय अवहेलनांच्या मुळांशी आहेत. असे म्हटल्याशिवाय रहावत नाही.
"स्त्रियांच्या डोळयांतून निष्कारण
गळलेला एकच अश्रूबिंदू अॅटम बांब
पेक्षा भयंकर उत्पात करू शकतो."
हा एका विचारवंत तत्वज्ञाचा इषारा लक्ष्यात ठेवण्यासारखाच आहे.
सनातन्यांचा कलकलाट नि सदनाची भरभराट
`पंडिता रमाबाई नांवाची एक राक्षसीण विधवांचा कैवार घेण्यासाठी पुढे सरसावली आहे, घरोघरच्या विधवाना आश्रमात ती नेत असते, त्याना शिकवीत असते, खायापियाला घालीत असते,` हा ज्याच्या त्याच्या तोंडी, कुत्सित बुद्धीने का होई ना, सारखा प्रवाद ऐकू येऊ लागल्यामुळे, "शारदा सदन हे जर आम्हाला माहेरघराची वागवणूक देत असेल, तर मी तिथं अगत्य जाईनच जाईन," अशा निर्धाराने पुष्कळ गांवोगांवच्या विधवा आपणहून रात्रबेरात्र सदनाच्या दरवाजाशी येऊ लागल्या. फार काय, पण कित्येक सनातन्यानीहि आपल्या विधवा लेकी सुना गुपचूप आणून सदनात ठेवल्या. पन्नासावर विधवांनी सदन पुन्हा गजबजले. शिवाय, कोठे एकाद्या बाईचा अथवा बालविधवेचा छळ होत असल्याची बातमी बाईना लागली तर त्या तात्काळ त्या ठिकाणी, मग ते कितीहि दूर असो, हिंदुस्थानातल्या कोणत्याहि प्रांतात असो, स्वता जावून तिची मुक्तता करीत असत. विरोधकानी कायदेबाजीचा पाठिंबा घेऊन अनेक वेळा त्यांना पोलिशी कचाट्यांत अडकवण्याच्या खटपटी केल्या. पण बेडर रमाबाई तेथेहि त्याना पुरून उरल्या.
`दानेदानेपर लिखा है खानेवालेका नाम.’
सदनात विद्यार्थिनींची जसजशी संख्या वाढू लागली, तसतसा खर्चाचा प्रश्न रमाबाईना भेडसावू लागला. अमेरिकेतून येणारी सालिना २०-२५ हजार रुपयांची मदत पुरेनाशी झाली. सदनांचे स्वताचे काही तरी हुकमी उत्पन्न असले पाहिजे, या हेतूने त्यानी पुण्यापासून ३४ मैलावरच्या केडगांव खेडयात १०० एकर जमीन खरेदी करुन तेथे शेतवाडी बागबगिचे तयार करून, त्या उत्पन्नावर सदनाच्या अन्नपाण्याचा प्रश्न सोडवण्याची खटपट करून ठेवली.
"माझा हात म्हणजे पैसा चाळण्याची चाळण आहे”
पैसा आला की तो गेलाच. एका हाताने किती चेक जमा झाले ते पहायचे आणि दुसऱ्या हातातल्या लेखणीने ते तात्काळ वाटेला लावायचे, एवढेच माझ्याकडे काम" असे रमाबाई नेहमी म्हणत असत. “शेकडो हजारो लाखो अनाथ अपंग विधवा भगिनींचा आत्मोद्धार व्हावा, त्या कामी माझे सारे आयुष्य एकरकमी झिजावे,” ही त्यांची महत्वाकांक्षा आणि हातांत असणारा तुटपुंजा पैसा, यांचा झगडा अखंड चालायचा. "मी काय कोणाचे संगोपन किंवा उद्धार करणार? कर्ता करविता देव समर्थ आहे. ज्याने तोंड दिले, तो भाकरीची सोय करतोच करतो. आपल्या खटपटी निमित्तमात्र" ही त्यांची श्रद्धा असे आणि कोठून ना कोठून लागेल तेवढा पैसा वेळच्या वेळी त्यांच्याकडे चालून येत असे.
सन १८९५ साली पुण्यात प्लेगचा कहर उसळला. इतक्या मुली तेथे रहाणे धोक्याचे होते. म्हणून रमाबाईनी केडगांवला तंबू ठोकून सदनातल्या बऱ्याचशा मुली तेथे नेल्या. केडगांवला पाण्याचा नेहमी दुष्काळ. घेतलेली जमीन खडकाळ. पण देवाचे नांव घेवून रमाबाईनी तेथे विहीर खणण्यास सुरुवात केली. त्याना मनमुराद पाणी लागले. बागायत शेत फुलू लागले.
१८९६ चा भयंकर दुष्काळ
इतक्यात मध्यप्रांत नि मध्यभारतात भयकंर दुष्काल पडल्याच्या बातम्या फैलावल्या. रमाबाईच्या हृदयात भूतदयेच्या कळवळ्याचे काहूर उसळले. दुष्काळात आपले आईबाप कसे पाणी पाणी करून तडफडून नेले, भावासह आपणहि उपासमारीचे हाल कदन्न खाऊन कसे काढले, तो सारा इतिहास यांच्या नजरेपुढे थयथयाट करू लागला. दुकाळातल्या स्त्रिया मुलींची सुटका हा प्रश्न चुटकीसारखा सुटणारा नव्हे. अन्नान्न करून प्राण सोडणाऱ्या हजारो लोकाना ही एकटी बाई कशी काय मदत करणार? जवळ नाही पैसा, नाही कसली साधन सामुग्री! जिथे सरकार आणि मोठमोठे लक्षाधीश दांत हात टिकतात, तेथे रमाबाईसारख्याचा पाड तो काय? पण त्यांचा हृदयस्थ आत्मारामहि त्याना स्वस्थ बसू देई ना.
"पूर्वीचे दिवस आठव आणि धावण्याला धाव" अशी त्याची सारखी टोचणी चालू झाली. मागचा पुढचा काहीहि विचार न करता, रमाबाई मध्यप्रांताकडे निघाल्या. त्यांच्या निश्चयाचा पुकारा होताच काही मित्रांकडून त्यांना थोडथोडी पैशाची मदत येऊ लागली. मध्यप्रांताच्या कमिशनराने "बाई या सर्वभक्षी दुष्काळाच्या वणव्यात तुम्हाला काहीहि करता येणार नाही, कशाला भलतीच होड घेता?" अंसे बजावले पण ईश्वरावर भरंवसा ठेवून त्या पुढे पाऊल टाकीत गेल्याच.
भुसावळ टप्प्यावरचा चमत्कार
आगगाडीने बाई जबलपुराकडे जात असताना, "भुसावळला उतर, याच गाडीने पुढे जाऊ नकोस" असा त्याना आतल्या आवाजाचा संदेश आला. त्याच गाडीने पुढे गेले नाही तर पुढची गाडी चार तासाने उशीरा येणार आणि ठरल्या टप्प्यावर आडवेळी पोचणार, असा पेच पडला तरी बाई भुसावळला उतरल्या आणि धक्क्यावरच्या बाकावर पुस्तक वाचत वेळ काढू लागल्या. असा वेळ काढणे फार कठीण असते. थोडे वाचावे, जरा इकडे तिकडे फिरावे, पुन्हा वाचावे, वाचण्या कडेहि लक्ष लागत नाही, डोक्यात विचारांचे वादळ चालू.
इतक्यात मुंबईडून नागपूर मेल आली. अवचित मिस हेलन रिचर्डसन ही रमाबाईची एक हितचिंतक मैत्रीण त्यांच्याकडे धावतच आली. "हल्लो रमाबाई, चटकन प्या बरं हे" असे म्हणून तिने बाईंच्या हातात एक नोटांचे पुडके दिले. "मुंबईहून निघाल्यापासून मी सारखी तुमची आठवण करीत होते. मनिआरडरच पाठवणार होते. पण इथेच भेटलात, बरे झाले. गुडबाय." असे म्हणून हेलनबाई चटकन गाडीत बसून निघून गेल्या. तळमळीच्या कार्यकर्त्याना साधनांची उणीव पडत नाही, हेच खरे.
दुष्काळाचे भयानक चित्र
“त्या बापड्या अभागी प्राण्यांच्या अंगांवर घड लकतरेहि नव्हती. एकीकडे भुकेने त्यांचे जीव कासावीस होत होते, तर त्याच क्षणाला ते थंडीने कुडकुडतहि होते. पुरुष बायका पोरे म्हातारीकोतारी तरणीताठी झाडाखाली वा ओसाड भिंतीच्या आसऱ्याने एकमेकांशी अगदी चिकटून बसलेली. सगळी काही एकदम मरत नसत. पण त्यांचे हाल पाहून, ही जिवंत राहण्यापेक्षा पटकन मरतील तर बरे असेच कोणाला वाटायचे. खरे दुर्दैव पुढेच आहे. नीच वृत्तीचे स्त्री पुरुष तरूण बायांच्या नि तरण्याताठया मुलींच्या पाळतीवर नेहमीच असतात. अन्नासाठी घरदार सोडून बाहेर पडलेल्या आणि दुष्काळी कामावर लागलेल्या असहाय बायांवर नि पोरींवर त्यांचा एक हलकट व्यापारच चालतो. या दुष्काळग्रस्तांची दीनवाणी दशा पाहून, बावीस वर्षापूर्वीच्या आमच्या लाजीरवाण्या दशेचे चित्र माझ्या डोळ्यांपुढे उभे राहिले. नशिब आमचे का त्या वेळी दुष्काळी छावणीत खडी फोडायला आमची रवानगी झाली नाही" असे रमाबाईनी या दुष्काळाचे चित्र काढलेले आहे.
देवावर भार टाकून रमाबाईनी साठ निरीश्रित विधवांची सुटका करून त्याना पुण्याला पाठवून दिले आणि या दौऱ्याच्या माहितीचा ‘बॉम्बे गार्डियन` पत्रांत एक लेख प्रसिद्धीला धाडला. त्यांत त्या लिहितात: "या वेळी तरुण बालविधवांविषयी माझे मन फारच कळवळले. त्याना रिलीफ कँपात किंवा दुष्काळी कामावर राहू देणे किंवा गाल्लीकुच्चीतून अगर हमरस्त्यावरून भटकू देणे म्हणजे त्यांचा पुरा सत्यानाशच होऊ देण्यासारखे आहे. दुष्ट टोळभैरवांच्या तावडीत त्यांतल्या काही सापडलेल्या. काही जन्माच्या निकामी होऊन फत्तरी काळजाच्या धन्यांनी घराबाहेर हुसकावलेल्या. काहीना दुर्धर रोग जडून त्या मरणाच्या पंथाला लागलेल्या. काही ईस्पितळांतून परतताच पुन्हा पापाच्या खायीत म्हणजे मरणाच्या दारात उभ्या राहिलेल्या. काहीनी जनलज्जा मनलज्जा सोडून दिल्यामुळे माणुसकीला मुकलेल्या. असले अनेक प्रकार पहाताच नरक नरक म्हणतात तो हाच! असे मला वाटले. त्याना अशा पोरक्या सोडून मरणी मेलेल्या त्यांच्या प्रिय आईबापांचा विचार माझ्या मनात येऊन माझ्या आतड्याना पीळ पडले. जिला म्हणून आईचे हृदय आहे, भगिनी प्रेम म्हणजे काय हे जिला कळते, अशी कोणती बाई अशा मुलींपैकी निदान थोड्या जणींकरता तरी आपल्या कडून काय अल्पस्वल्प करता येईल ते केल्याशिवाय राहील बरे? अगर त्यांना मांगहृदयी माणसांच्या कचाट्यातून तरी सोडवल्याशिवाय राहील?"
सहायकांची झुंबड उडाली
दुष्काळग्रस्त स्त्रियांना आसरा देण्याच्या रमाबाईच्या कार्याचा डंका सर्व जगभर गाजला आणि इंग्लंड, स्कॉटलंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, अमेरिका येथून त्यांना पैशाची नि सहायकांची मदत सपाटून आली. अंदाजे ३ लाख रुपयांची गंगाजळी जमली. त्या ३ वेळा मध्यप्रांतात स्वता गेल्या आणि ५००-६०० अबलांची सोडवणूक करून त्याना शारदा सदनांत आणि अगर मिशनरी मठांत आश्रयासाठी पाठवून दिले.
शारदा सदनात जेमतेम १०० तरुणांची व्यवस्था होण्याइतकी जागा असे. तेथील सगळा कारभार सुंदराबाई पवार पाहू लागल्या. केडगांवला तांतडीने काही झोपडया बांधून तेथे बाकीच्या निर्वासितांची सोय लावली.
या वेळी रमाबाईना सहाय करण्यासाठी गंगाबाई नांवाची एक शूर बाई पुढे आली. काशीबाई नांवाची एक शेतकरीण, सौदामिनीबाई आणि भीमाबाई यांच्यासह शूर गंगाबाईने मध्यप्रांतात अनेक स्वाऱ्या करून, तिकडून अनाथ मुलींच्या टोळ्याच्या टोळ्या केडगांवला आणण्याचे कार्य केले. मणिकर्णिकाबाई (रमाबाईची सावत्र भावजय), मेरीबाई आयमन (ट्रेण्ड नर्स), याशिवाय युरप, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, अमेरिकेतून आलेल्या १५-२० स्वार्थत्यागी तरूण कुमारिका केडगांवच्या मुक्ति सदनाच्या विविध कार्यक्षेत्राना ठाकठीकपणा द्यायला रमाबाईच्या नेतृत्वाखाली दिवसाची रात्र करून झटत झडत होत्या.
बोलणे सोपे, करणे कठीण
दुष्काळातल्या मुली सोडवून आणण्याच्या कार्यावरहि रमाबाईच्या धंदेबाज राजनिंदकांची कुत्सित टीका झालीच. "पांढरपेशा प्रतिष्ठित समाजातून सदनात विधवा येईनाशा झाल्या, म्हणून बाईंनी ही फुकटी टोळधाड जमा केली आहे” या आक्षेपावर मुंबईच्या सुबोधपत्रिका साप्ताहिकाचे संपादक कै. वैद्य महाशयांनी (हे कट्टर प्रार्थनासमाजी म्हणजे हिंदुधर्मी होते.) खडसावून जबाब दिला की, “फक्त मत्सरच असे बरळू शकतो. इतरांच्या दुःखाने पंडिताबाईंचे मृदू हृदय तात्काळ लोण्यासारखे द्रावणारे होते. आजूबाजूला हजारो जीव अन्नाच्या घासासाठी नि पाण्याच्या घोटासाठी तडफडत असताना आपण मात्र खात पीत मजा मारीत स्वस्थ बसावे, स्वतःपुरते पहावे अशी त्यांची वृत्तीच नव्हती.”
नुसत्या बाया मुली सोडवून आणल्याने हा प्रश्न सुटण्यासारखा थोडाच होता? आजही निर्वासितांच्या प्रश्नाने भारत सरकारच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मोफत शिधा आणि आंगड्या घोंगड्याची सोय केल्याने ही भानगड मिटू शकत नाही. रमाबाईंनी सोडवलेल्या शेकडो स्त्रिया केवळ पशू वृत्तीच्या होत्या. स्वच्छता ही चीजच त्यांना ठाऊक नव्हती. दुष्काळात पडलेल्या अनेक घाणेरड्या सवयी त्यांना जडल्या होत्या.
काहीजणी उनाड बंडखोर असत. घाणेरड्या रोगानी काही सडलेल्या होत्या. तर काही माथी फिरून वेड्या झालेल्या होत्या. त्या सर्वांना स्वच्छता शिकवायची, साक्षर उद्योगी बनवायच्या, धर्मशिक्षणाने नीतीचा बोध करायचा, कामधंदा शिकवून स्वावलंबी बनवायचे, सहकार्याची शिस्त लावायची आणि ज्ञानी विचारवंत उद्योगी करून त्याना माणुसकीत आणायाचे काम लेख लिहिण्याइतके किंवा व्याख्यान झोडण्याइतके सोपे नव्हते. रमाबाई क्रिस्ती झाल्यामुळे `माणसांतून उठली` असा गवगवा करणाराना, "पाषाणहृदयी हिंदु समाजाने आणि अस्मानी सुलतानाने माणसांतून उठवलेल्या शेकडो अभागिनींना मी माणुसकीचे जीवन देऊन अनेकमुखी समाजकार्याला लावलेल्या आहेत," असा रोखठोक जबाब रमाबाईनी `याची देही याची डोळा` आपल्या प्रत्यक्ष कार्याने दिलेला आहे. कारण पुढे सन १९०० साली गुजरात मध्ये भयंकर दुष्काळ पडला तेव्हा मध्य प्रांतातून सोडवलेल्या शेकडो तरुणींनी तेथल्या संकटग्रस्त मुलींची सुटका करण्याच्या कामी गुरूसे चेला सवाई हिंमतीने कार्य करून दाखविले.
प्रकरण ९ वे
पाया रचुनी भली उभारणी झाली
संकटग्रस्त अनाथ अपंग बाया मुलांना एकत्र आणून रमाबाईना त्यांचा पांजरापोळ बनवायचा नव्हता. अनेक शारिरीक मानसिक रोगांनी पछाडलेल्या बायाना धडधाकट करण्यासाठी प्रथम त्यानी एक तज्ञ स्त्री डॉक्टराच्या देखरेखीखाली व्यवस्थित दवाखाना चालू केला. लहान मुलांमुलींच्या आरोग्याबरोबरच त्यांचे लालनपालन, खेळ आणि अक्षर-शिकवणी बंदोबस्त केला. ज्या तरुणी बुद्धीच्या बाबतीत ढ आढळल्या त्याना बालसंगोपन, कपडे धुणे, कापडांचे माग चालवणे, दळणकांडण करणे, बगिचांची मशागत, शेतकाम, शिवण कशिदा काम, किंवा दूध दुभत्यांचे नि कॉबडखान्याचे काम शिकवून तेथे कामाला लावल्या. सदनाचा संसार हरएक बाबतीत स्वयंपूर्ण नि स्वावलंबी बनवण्यासठी प्रत्येकीने आपल्या मगदुराप्रमाणे दररोज दरघडी काही ना काही काम केलेच पाहिजे असा दण्डक चालू केला. रमाबाईंची ही शिस्त आजही मुक्ति सदनात यंत्रासारखी चालू आहे. ज्या मुली नि तरुणी बुद्धीने चलाख आढळल्या, त्याना मराठी इंग्रेजीचे शिक्षण, ईस्पितळात शुश्रुषा, छापखान्यात यंत्रे चालवण्याची कामे दिली. या पांगळ्या बायाना दळणकांडण, तऱ्हेतऱ्हेच्या टोपल्या हातऱ्या बनवण्याचे काम देवून शिवाय `ब्रेल` पद्धतीने लिहिण्यावाचण्याला शिकवणे सुरू केले. एक मोठे चर्च बांधून तेथे सकाळ संध्याकाळ ईश्वरोपासना व्हायची. यावेळी घंटा वाजताच सगळ्यानी बिनचूक वेळेवर हजर राहून प्रार्थना करायची. सकाळपासून मध्यरात्री पर्यन्त रमाबाई एखाद्या गरुड नेत्री सेनानायकाप्रमाणे प्रत्येक ठिकाणच्या कामांवर देखरेख करीत अखंड फिरत्या असायच्या. जागोजाग थांबून जन्मदात्या आईच्या वत्सलतेने कोणाला उत्तेजन द्यायच्या. चुकले काम स्वता करून दाखवायच्या. शाबासकी द्यायच्या, लहान मुलांचे लाड पुरवायच्या, थट्टा मस्करी करायच्या, तरीहि त्यांची शिस्त कडवी असायची. हजार बाया मुलांचे खिल्लार त्या पाळीत पोशीत होत्या. शिक्षणाने त्याना मानवी जीवन देत होत्या. त्यांच्या ठेचलेल्या महत्वाकांक्षा स्नेहाळपणाचे पाणी घालून खुलवत होत्या. तरी प्रत्येक बाई मुलांचे नांव आणि ती कोठे कोणत्या अवस्थेत वाढली हा तपशील त्याना सांगावा लागत नसे. कोणालाहि त्या चटकन त्याच्या नांवाने हाक मारीत असत. त्यांचा शिस्तीचा दरारादि तसाच कडक नि कदरबाज असे. हजार प्रकृतीच्या नि संस्कृतीच्या मुली. जंगली प्राण्यांची एक सर्कसच होती ती! कित्येक मुली हुंडग्या सदनातून पळून जायचाहि उद्योग करीत. कित्येक कामचुकारपणा करायच्या. काही भयंकर भांडाळ तोंडाळ खट्याळ नि कलहाची लावालावी करणाऱ्या तर काही चोरट्या बदमाश असत. या सगळ्याना सांभाळायचे काम फार किचकट बिकट तसे तिखटहि होते. आजीबाई करून शहाणपण शिकवण्याचे यत्न थकले का रमाबाई गुन्हेगाराला खांबाला बांधून फटके देणे, कोंडून ठेवणे, मीठभात नि पाण्याचाच खुराक देणे, उठाबशा काढायला लावणे, उपाशी ठेवणे, भांडकुदळाना एकाच जात्यावर दळायला लावणे, अशा शिक्षा देत असत. कित्येक बेफाम तरुणींचे कपाळावरचे केसच कापून टाकायच्या. त्याना बाहेर पडायला लाज वाटायची आणि कामाला तर बाहेर पडणेच जरूर. मग त्या वठणीवर यायच्या. शिक्षा का दिली हे प्रत्येकीला त्या हळूवारपणे समजावून सांगायच्या. मुलीला पश्चात्ताप झाला का लगेच तिला त्या पोटाशी धरून तिचे मुके घ्यायच्या.
निरनिराळ्या खात्यांसाठी तात्पुरत्या झोपड्या बांधल्या आणि एकीकडे इमारती बांधण्याचे काम चालू केले. परदेशांतूनहि अनेक हुशार नि निरलस मिशनरी स्त्रिया रमाबाईच्या मदतीला धावून आल्या. अशा रीतीने एक वर्षाच्या आतच केडगांवला सुमारे हजार स्त्री निर्वासितांच्या आरोग्याची, नीति शिक्षणाची साक्षरतेची, निरनिराळ्या उद्योगधंद्यांची बैठक ठाकठीक बसली. या कामी पंडिताबाईनी दाखवलेला व्यवहारी धोरणीपणा, स्वावलंबनाचे असलेले अनेक मार्ग, प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाचे वृत्तीचे नि कुवतीचे केलेले परीक्षण निरीक्षण आणि मार्गदर्शन, आजच्या भारत सरकारने निर्वासितांच्या प्रश्नांचे कोडे सोडवताना कित्ता गिरवण्यासारखे आहेत.
पुण्याची `शारदा` केडगांवाला आली
रमाबाई केडगांवच्या जंगलाचे मंगल करीत असताना, सुंदराबाई पवार पुण्याचे शारदा सदन हिमतीने चालवीत होत्या. उच्चवर्णीय हिंदू विधवांसाठी शिक्षणाची शाळा म्हणून शारदा सदन जन्माला आले, तेथे प्रत्येक विद्यार्थिनीला आपापला धर्म आचरण्याची मोकळीक होती. पण आता रमाबाईनी अच्चवर्णीय हिंदु विधवांपुरता संकुचित दृष्टीकोन बदलून माझ्या दाराशी येईल ती माझी मुलगी मग ती उच्चवर्णीय असो नसो, अस्पृश्य मानलेली असो वा गुन्हेगार ठरवलेल्या जमातीतील असो, तिच्या पालनपोषणाची, शिक्षणाची नि काहीतरी उद्योग शिकवून तिला स्वावलंबी बनवण्याची जबाबदारी मी घेईन हे व्यापक धोरण जाहीर केले आणि केडगावच्या आश्रमाला ‘मुक्ति सदन’ हे नाव दिले. पुण्याच्या शारदा सदनाला त्यात समाविष्ट करून तेथल्या इमारती विकून टाकल्या. शिवाय मुक्ति सदनातील धार्मिक नि नैतिक शिक्षण त्या धर्मानुसार राहणार हा संकेत कायम केला. मात्र त्या धर्माचे माहात्म्य मनोमन पटल्याशिवाय, कोणी आग्रहाने मागणी केल्याशिवाय आणि त्या मागणीची कसोटी पाहिल्याशिवाय कोणालाही सदनात आश्रयाला आलेल्या किंवा आणलेल्या कोणालाही बाप्तिस्मा देण्यात आला नाही. धर्मप्रसाराचा सदनाचा हेतू किती उघड असला, तरी मानवतेच्या सेवेला प्राधान्य असून धर्माचा मुद्दा ज्याच्या त्याच्या इच्छेवर असतो.
बाईंचे अमेरिका इंग्लंडला प्रयाण
अमेरिकेने दिलेल्या सांपत्तिक मदतीची दहा वर्षाची मुदत संपल्यामुळे १८९८ साली पंडिता अमेरिका इंग्लंडच्या दौऱ्यावर गेल्या. तेथील उच्च शिक्षणासाठी त्यानी पाच हुशार तरुणी जाताना बरोबर नेल्या. अमेरिकन जनतेने रमाबाईंचे मोठे थाटाचे स्वागत केले. पुणे केडगांव येथे केलेल्या कार्याचा अहवाल सर्वतोमुखी करण्यासाठी रमाबाईची शहरोशहरी जाहीर व्याख्याने झाली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, स्कॉटलंड देशांतून केडगांवच्या मुक्ति सदनाला सालोसाल भरपूर सांपत्तिक मदत येत जाईल, अशी व्यवस्था करून, सात महिन्यांच्या दौऱ्यावरून रमाबाई हिंदुस्थानात परत आल्या.
१९०० चा गुजराथचा दुष्काळ
अमेरिकेला जाताना केडगांवला चालू केलेल्या अनेक कार्यविभागांच्या इमारतीचे बांधकाम पुरे होत आले होते. या परत येताच सगळी उद्योगाची खाती यंत्रासारखी कामे करू लागली. शिक्षण-संस्काराने शेकडो मुली माणसांत येऊन आपल्या भावी कर्तबगारीचा मार्ग चोखाळायला सज्ज तयार होत्या. लुल्या पांगळ्या आंधळ्या बाया मुलीहि आपापल्या कामांत गढल्या. शेती बागमळे बहारले. धान्य फळे भाज्यांचे ढिगार सदनाचा संसार चालवून आठवड्याच्या बाजारात विक्रीला जाऊ लागले. छापखाना, कापडाचे माग, शिवणकामाची यंत्रे रात्रदिवस खडखडू लागली. सारांश, या अवधीत केडगांवचे मुक्ति मदन सर्वतोपरी स्वावलंबी आत्मोद्धाराचे संस्थान बनले.
सन १९०० मध्ये गुजराथेत दुष्काळाने कहर उडवला. या वेळी "मातोश्री रमाबाईनी आम्हा दुष्काळग्रस्तांच्या बचावासाठी काम श्रमसाहस केले आणि आपल्याला नीति ज्ञानाचा संस्कार देऊन माणूसकीचा नि सेवेचा मार्ग दाखवला" या कृतज्ञ जाणिवेने कर्तबगार बनलेल्या सुमारे ४०-५० तरुणी गुजरातला दुष्काळग्रस्त बाया मुलीना सोडवण्यासाठी स्वता धावल्या. रमाबाईच्या पावलांवर पाऊल ठेऊन अबलोद्धारांची कामगिरी त्यानी इतकी उत्कृष्ट बजावली का एके दिवशी मुंबईचे गव्हर्नरसाहेब अवचित नि अयाचित केडगावला येऊन त्यांनी रमाबाईना मनसोक्त धन्यवाद दिले.
मुक्ति सदन म्हणजे खेडूतांचे मायपोट
केडगांवच्या जमिनीवर रमाबाईनी प्रथम पाऊल ठेवले तेव्हा ती ओसाड रुक्ष नि खडकाळ होती. गावात पाण्याचा नेहमीच दुष्काळ. वर्षातून चारसहा महिने शेतकामाच्या मजुरीशिवाय खेडूताना दुसरा उद्योगच नसे. सदनासाठी विहिरी खणण्याचा इमारती बांधण्याचा, शेते बगीचे करण्याचा कारखाना चालू झाल्यावर, सुतार गवंडी पाथरवट हरकाम्ये अशी कितीतरी कामे खेडूताना मिळू लागली. गाई म्हशीचे खिल्लार, कोंबड्या, बदकांची पोल्ट्री, शेळ्या मेंढ्यांची चरणी, किती तरी उद्योग खेडूत पुरुष स्त्रियाना मिळाले. सदनाच्या ईस्पितळात लहान मोठ्या आजारांची मोफत तरतूद होऊ लागली. खेडूत बाळंतिणींच्या प्रसूतीची मोफत व्यवस्था झाली. त्यांच्या लहान मुलांमुलींसाठी मोफत प्राथमिक शाळेचीहि सदनाने सोय केली. रमाबाईनी आठवड्याच्या बाजाराची प्रथा पाडली. मुक्ति सदनच मोठे गिऱ्हाईक लाभल्यामुळे, कापडचोपड, खेळणी, फळफळावळ, भाज्यांची खरेदी विक्री होऊ लागल्यामुळे आसपासचे पुष्कळ व्यापारी बाजारात येऊ लागले. शिवाय, नाताळात मोठा सात दिवसांचा बाजार भरू लागला. त्या वेळी धर्मप्रचारासाठी सदनातर्फे प्रदर्शने भरतात. सदनातून शिकून बाहेरगावी गेलेल्या शेकडो शिक्षिका, डाक्टरणी, धर्मप्रचारक, नर्सेस, प्रोफेसर तरुणी नाताळात माहेरवाशिणी म्हणून यायच्या. सदनातल्या आंधळ्या पांगळ्या बाया मुलीनी तयार केलेल्या संसारोपयोगी अनेक सुंदर वस्तू बाजारात विकत घ्यायला पुणे सोलापुरापासून शेकडो गिऱ्हाईक नाताळच्या बाजाराला यायचे. सदनाची शेती, बांधकामाची कामे एकसारखी चाललेलीच. सुतार गवंडी पाथरवट कामगारांची कितीतरी हिंदू कुटुंबे सदनाच्या आसपास आपआपापली छोटी घरे बांधून राहू लागली. त्यांचे वंशज आजही तेथे रहातात.
केडगांवात मूळचाच पाण्याचा तुटवडा, पण रमाबाईनी बांधलेल्या बारा प्रचंड विहिरींना मात्र बारा मास मुबलक पाणी. आजूबाजूला उन्हाळ्यांत पाण्याचा ठणठणाट उडाला का खेडूताना रमाबाईच्या विहिरीचा मोठा आसरा असतो. अन्नटंचाईच्या दिवसांत गोरगरिबाना सदनाकडून अन्नदान बिनचूक मिळायचे. गरजवंत मुक्ति सदनाच्या दारात जावो, त्याला निरीच्छ करायला पंडिताबाईचे सदन आजही हासत मुखाने हात जोडून उभे असते. भुकेल्याला ओले कोरडे अन्न आणि तान्हेल्याला पोटभर पाणी देण्याचा खरा मानवधर्म सदनात अखंड पाळला जात आहे.
कुमारी मनोरमा
रमाबाईच्या उत्तर आयुष्यात त्यांच्या मनोरमा मुलीने त्यांच्या अनेकमुखी कार्याचा फारच मोठा भाग उचललेला होता. `मा से बेटी सवाई` होती ती. अगदी लहानपणापासूनच तिला खास इंग्लंडात विद्वान इंग्लीश बायांच्या देखरेखीखाली प्राथमिक नि मध्यम श्रेणीचे आणि फ्रेंच भाषेचे उत्कृष्ट शिक्षण मिळाले. अमेरिकेत उच्च शिक्षणाचा लाभ झाला. जीवनाला आचार विचारांची एक विशेष शिस्त लागली. इंग्रेजी भाषेवर अर्थात असामान्य हुकमत, मनोरमाबाईची व्याख्याने म्हणजे हिऱ्या मोत्यांचा नुसता वर्षाव व्हायचा असे एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने म्हटले होते. मुक्ति सदनाचे खर्चाचे नि पत्रव्यवहाराचे खाते संभाळून ती इतर मुलीच्या बरोबरीने प्रत्येक विभागात काम करायची. धर्मप्रसारासाठी किंवा संकटात अडकलेल्या मुलीना सोडवण्यासाठी हिरिरीने हिंदुस्थानाच्या वाटेल त्या भागात धावून जायची. सदनात मुलांमुलीचे शिक्षण जसजसे वाढत गेले, तसतसे मध्यम श्रेणीच्या सरकारमान्य पद्धतीसाठी शिक्षणतज्ञ पदवीधर शिक्षिकांची उणीव भासू लागली. यासाठी मनोरमा पुण्याच्या डेक्कन कॉलेजात जाऊन अभ्यास करू लागली. दररोज ती केडगांवाहून आगगाडीने पुण्यास यायची नि संध्याकाळी परत जायची. एकादे वेळी गाडी चुकली तर सदनाचा घोड्याचा टांगा जोडून ती पुण्याला यायची. ती बो. ए. झाली आणि पुढे बी. टीहि झाली. तिने नंतर मुक्ति सदनांच्या कार्याची माहिती देवून सांपत्तिक सहाय मिळवण्यासाठी आस्ट्रेलिया, न्यू झीलंड, अमेरिका इंग्लंड, स्कॉटलंड देशांचा दौरा काढला. परत आल्यावर तिने अनेक कामांची झोड उठवली. निजाम राज्यातल्या गुलाबर्गा शहरात मिशनची शाळा काढली. प्रथम शाळेच्या योजनेला तेथील पुढाऱ्यानी इमारतीसकट भरपूर द्रव्यसहाय देऊ केले. पण शाळेत बायबल प्रार्थना इत्यादि क्रिस्ती प्रथा चालणार असे कळताच सगळ्यानी माघार घेतली. अशाहि परिस्थितीत मनोरमेने शाळा उघडली नि स्वता श्रमुन ती चालविली. रमाबाईना मनोरमेचा मोठा
आधार वाटू लागला. त्यानी आपल्या आशा आकांक्षा तिच्या भावी कर्तबगारीवर खिळवून ठेवल्या. पण हाय! ताकदीपलीकडे श्रमांची मजल गेल्यामुळे मनोरमेला क्षय रोगाचा विकार जडला. त्यावर मिरज ईस्पितळात औषधोपचार चालू असताना ती २४ जुलाई १९२१ रोजी क्रिस्तविलीन झाली. रमाबाईना भयंकर धक्का बसला. त्यांचीहि प्रकृति खालावत गेली. ता. ५ अप्रिल १९२२ रोजी त्याहि क्रिस्तविलीन झाल्या.
अखेरची आरती
अल्प वयातच निराधार पोरकी झालेल्या एका मराठी महिलेने पंचखंड दुनियेला विळखा घालून, केडगांवच्या मुक्ति सदनासारखे हज्जारो अनाथ अपंग स्त्रियांचा आत्मोद्धार करणारे अकल्पनीय थोर कार्य करावे, हा मराठ्यांच्या अर्वाचीन इतिहासातला समाजसुधारणेचा एक मोठा अभिमान करण्यासारखा टप्पा होय. पंडिताबाईने धर्मांतर केले तरी स्वदेशाभिमानांतर मुळीच केले नाही. त्यांच्या मनोरमा कन्येचा हिन्दुत्वाचा अभिमान जागताज्योत होता. वॅण्टेजहून त्या शिक्षणासाठी अमेरिकेला जाऊन परत लंडनला आल्या, तेव्हा तेथल्या काही सेविका-भगिनी कौतुकाने नि लाडिकपणाने म्हणाल्या, “ही पहा आमची छोटी अमेरिकन पंडिता आली.” त्यावर मनोरमा चटकन उमाळ्याने म्हणाली, "काय अमेरिकन? छट. मी काही अमेरिकन नव्हे. मी हिन्दू आहे." हिन्दू उर्फ वैदिक धर्मियानीच काय तो हिन्दुत्वाचा अभिमान बाळगावा, त्यानाच काय तो अधिकार, असला हट्टवाद मूर्खपणाचा आहे. डॉ. अॅनी बेझंटबाई जन्माने आयरिश तरी स्वताला हिंदु म्हणवीत.
रमाबाईचे अनेक भाषा - प्रभुत्व
मराठी ही तर त्यांची मायबोली होतीच. स्त्रीधर्म नौति, युनायटेड स्टेट्सची लोकास्थिति आणि प्रवासवृत्त, याशिवाय क्रिस्तधर्म-प्रचारासाठी त्यानी लिहिलेली अनेक छोटी मोठी मराठी पुस्तके त्यांच्या बालबोध सहजमुलभ आणि गोंडस मराठी भाषासरणीचे कित्ते आहेत. संस्कृत भाषेत तर त्या अस्खलित व्याख्याने देत आणि स्वयंस्फूर्त कविताहि करीत. त्यांचे इंग्रेजी भाषेवरील प्रभुत्व `हायकास्ट हिंदू वूमन` या अमेरिकेत छापलेल्या ग्रंथात चमकले. अवघ्या दोन वर्षाच्या स्वाध्यायाने ही हिंदु तरुणी परकीय इंग्रेजी भाषेत इतका `स्टायलिश` ग्रंथ लिहू शकते नि तासन्तास व्याख्यानेहि देऊ शकते, याचे इंग्लिश नि अमेरिकन भाषातज्ञानी कौतुक केले. बंगाली भाषाहि त्या बोलत असत. गुजराच्या दुष्काळात अबलोद्धारासाठी उडी घेताना त्यांनी गुजराथी भाषाही आत्मसात केली. बायबलचे झालेले मराठी भाषांतर रमाबाईंना पसंत नव्हते. खेड्यापाड्यातील लोकांना समजेल असे सोपे नि बाळबोध मराठी भाषांतर करण्याचे प्रचंड कार्य त्यानी हाती घेतले. इंग्रेजीवरून मराठी न करता त्यानी मूळ प्राचीन हिब्रू बायबलवरून ते करण्यासाठी प्रथम त्यानी हिब्रू (जुन्या कराराची मूलभाषा) आणि ग्रीक (नव्या कराराची भाषा) या दोन भाषांचा इतका सपाटून अभ्यास केला की दोन्ही भाषांत त्या सफाईने बोलू लिहू शकत.
ग्रंथ प्रकाशनासाठी छापखाना
हिब्रू ग्रीक भाषांच्या प्राविण्यानंतर त्यांनी सन १९०५ झाली मराठी, इंग्रजी, हिब्रू, ग्रीक टाईपांचा भरणा करून एक छापखाना मुक्ति सदनात उभारला. टाईप जुळवणे, यंत्रे चालवणे, प्रुफे वाचणे, छपाई करणे, पुस्तकें बांधणे, इंजिन चालवणे इत्यादि कामांसाठी शिकवून लायक केलेल्या मुलींच्या नेमणुका केल्या. दररोज जसे बायबलचे मराठी भाषांतर व्हायचे, तसतसे ते जुळवून छापले जायचे. तब्बल १८ वर्षे हा व्यवसाय, सदनातली रोजची कामे सांभाळून, रमाबाई अखंड करीत होत्या. त्यांच्या मराठी बायबलची पहिली आवृत्ती सन १९२४ साली म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर २ वर्षांनी बाहेर पडली. बायबल छपाईचे काम चालले असताना क्रिस्ती धर्मप्रसाराची शेकडो पुस्तके छापखान्यात नेहमी छापली जातच होती.
रमाबाईंचे जीवन म्हणजे शुद्ध निर्मळ शुचितेचा गंगाप्रवाह होता ठिकठिकाणांहून आणलेल्या मुलींच्या बाबत पुष्कळ सरकारी कटकटी विरोधकांकडून होत असत, परंतु त्यांच्या शुद्ध चारित्र्यावर आरोपाचा एक बिंदूहि शिंपडण्याची कोणाची छाती झाली नाही. "त्यानी येशू क्रिस्ताची अनन्य भावाने भक्ती केली म्हणूनच त्यांच्या हातून अबलोद्धाराची मोठमोठी कामे झाली, हा त्यांच्या चरित्राचा मुख्य नि महत्वाचा भाग लिहायला विसरू नका” असे मुक्ति सदनातील अनेक कार्यकर्त्या भगिनींनी मला सुचविले आहे. सूचनेबद्दल आभारी आहे.
रमाबाईची क्रिस्ती धर्मश्रद्धा
रमाबाई प्रचलित सर्व धर्मपंथ त्यागून येशू ख्रिस्ताला शरण गेल्या. "जो या भवसागरी आमचा वाटाडी, आमचा संयोजक, आमचा सहाय्यक, त्याची परिपूर्ति प्राप्त झाली, म्हणूनच आम्हाला अजब सामर्थ्य प्राप्त झाले," अशी त्यांची खरोखर श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेचे फळही त्यांच्या पदरात पडले. या मुद्द्या विषयी शंका संशय घेण्याचे कारण नाही आणि कोणाला काही प्रयोजन नाही. परंतु, चालू घडीच्या अखिल जगतातल्या मानवानीहि त्याच एका येशूवर श्रद्धा ठेवावी हा जो त्या भगिनींच्या सूचनेतला गर्भितार्थ उघड दिसतो, तो देवधर्माच्या कल्पनेला विज्ञानाच्या मुशीत टाकून तिचे वायफळपण सिद्ध करणाऱ्या सध्याच्या बुद्धिवादी समाजरचनेला कितपत ग्राह्य अथवा मान्य होईल, याची मात्र शंका येते.
"धर्मावाचुनि प्राण न जाती, देवाविण नच अडते
आत्मशक्ति खंबीर तयाच्या त्रिभुवन पाया पडते”
रमाबाईच्या पावलांवर पाऊल टाकून महाराष्ट्र महर्षी धोंडोपंत कर्वे यानीहि हजारो हिंदुधर्मी विधवांचा नि महिलांचा उद्धार करण्याची अजरामर कामगिरी बजावली आहे. त्यांच्या शिष्या पार्वतीबाई आठवले यानीहि इंग्लंड अमेरिकेचा दौरा काढून तिकडून द्रव्यसहाय्याच्या थैल्या कर्व्यांच्या आश्रमासाठी आणल्या. स्वतः त्यांनीही आपल्या कर्तबगारीने पंचखंड दुनियेचे लक्ष्य आपल्या कामाकडे वेधण्यासाठी देशोदेशी दौरे काढले. द्रव्य जमवले. त्यांचे कोठे येशूभक्तीशिवाय अडले? त्यांची सारी श्रद्धा त्यांच्या कार्यावरच होती. सारांश, श्रद्धा हे एक असे चमत्कारीक रसायन आहे की ते सगळ्यानाच एकजिनसी एकरकमी मानणारे किंवा पचनी पडणारे नाही. जो तो आपल्या मगदुराप्रमाणे त्याची निवड करतो आणि समाधान मानतो. त्याची इतरांनी चर्चा चिकित्सा करण्यात स्वारस्य नाही. श्रद्धेच्या हट्टवादानेच सुखापेक्षा दुःखांची आणि समाधानापेक्षा असंतोषाची पेरणी मानव समाजात फार झालेली आहे.
आजचे केडगावचे मुक्ति सदन
रमाबाईंच्या अवसानानंतरही केडगावची मुक्ति सदन संस्था आजही त्यांनी आखलेल्या नीतीनियमांप्रमाणे कदरबाज नि शिस्तप्रिय चाललेली आहे. निरनिराळे उद्योग करून सुखासमाधानाने येथे राहत असलेल्या सातआठशे बायका यांच्या पूर्व आणि उत्तर जीवनाचा विचार केला म्हणजे हा आश्रम नसता तर या आंधळ्या पांगळ्या हतबल आणि वेडसर जीवांना गावोगाव भीक मागण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. तेथे नाना कला विद्या शिकून गावोगाव तज्ञ म्हणून अनेक सामाजिक कार्ये करत असणाऱ्या तरुणींच्या आयुष्याचे मातेरे झाले असते. इंग्रजी काय किंवा आणि काय, कोणत्याही सरकारला अनाथ अपंगांचा नि निर्वासितांचा प्रश्न नीटसा सोडवता आलेला नाही. हिंदु समाजाने तर असल्या अभागिनिंची कीव चुकून सुद्धा कधी केली नाही. कोणी करीत असला तर त्याची अवहेलना मात्र रग्गड केलेली आहे. या सिद्ध सत्याच्या पायावर पंडिता रमाबाई यांच्या मुक्ति सदनाची कामगिरी ठेवून पाहिल्यावरच या संस्थेचे वाजवी मोल, महत्त्व आणि माहात्म्य पटणारे आहे.
मुक्ति सदनात सध्या २०-२५ देशी परदेशी अविवाहित भगिनी निरनिराळ्या विभागांत कामे करीत असतात. कॅनडा, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथून आलेल्या कुमारिकांची सेवनिष्ठा वाखाणण्यासारखी आहे. येथे एक दवाखाना, एक शस्त्रक्रियागृह, प्रसूतिगृह असून त्याचा फायदा आजूबाजूची सगळी खेडी नि गावे मोफत घेत असतात. नवनवीन विभाग सारखे निघताहेत आणि त्यांच्या प्रशस्त इमारतींची कामे अखंड चालली आहेत. चार दिवसांच्या लहान मुलापासून तो वृद्धवस्थेने जर्जर झालेल्या बाया, सगळ्यांचा येथे पुरस्कार होत असतो. सर्वांनी एकवार भेट देण्यासारखी ही संस्था आहे.
ही खिरापत घ्या
पंडिता रमाबाईंच्या क्रांतिकारक तुफानी कर्तबगारीच्या चरित्राने फार वर्षांपूर्वी माझ्या मनाला जो आकर्षणाचा चटका बसला तो मराठी बंधू भगिनीपुढे ९ प्रकरणांच्या शब्दांनी ठेवला आहे. उपेक्षितांच्या देवडीवरचा भालदार नात्याने हे एका थोर लोकोत्तर मराठी वीरांगनेचे विस्तृत चरित्र प्रकाशात आणून ठेवीत आहे. त्याच्या वाचनाने अनेक भगिनींना उत्कट दिव्य भव्य अशा नवनवीन कार्यक्षेत्रात हिरीरीने पाऊल टाकण्याचे चैतन्य मिळावे. त्यानी यापुढे सालोसाल पंडिता रमाबाईंचा स्मृतिदिन साजरा करून तिला आदराचे प्रणाम करावे एवढीच माझी अपेक्षा आहे.
जय महाराष्ट्र