माझी जीवनगाथा
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
पहिल्या आवृत्तीविषयी
माझी जीवनगाथा
(आत्मचरित्र)
प्रबोधनकार ठाकरे
@ श्री बाळासाहेब ठाकरे,
संपादक, मार्मिक, `मातोश्री`,
२५, कलानगर, वांद्रा (पूर्व),
मुंबई – ४०००५१
प्रथम प्रकाशित १७ सप्टेंबर, १९७३
प्रकाशक
ग. श्री. कोशे,
सोमैया पब्लिकेशन्स प्रा. लि.,
१७२, नायगाव क्रॉस रोड, दादर, मुंबई ४०० ०१४
मुद्रक
श्री. र. देसाई,
दि बुक सेंटर प्रा. लि.,
१०३, सहावा रस्ता, शीव (पूर्व), मुंबई – ४०० ०२२
प्रकाशनवर्ष १९७३
दुसरी आवृत्ती : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
१९९७
पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना
बहुजनांचे कैवारी महाराष्ट्रभूषण प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे आधुनिक महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन, इतिहासविषयक व नाट्यादी क्षेत्रांतील कार्य, कीर्ती नि कामगिरी महशूर आहे. त्यांचे वादळी व्यक्तिमत्त्व विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापासून महाराष्ट्राच्या सामाजिक पुनर्घटनेच्या कार्यक्षेत्रात सतत गाजत राहिले आहे. अशा ह्या थोर पुरुषाच्या ज्ञानगंगेचे पाणी मी अनेकदा प्राशन केल्यामुळेच प्रबोधनकारांच्या `जीवनगाथे`स प्रस्तावना लिहिण्याचा हा बहुमान मला देण्यात आला असावा, असे मला वाटते.
प्रबोधनकार म्हणजे एक बहुरंगी, बहुढंगी नि बहुरूपी कर्तृत्ववान पुरुष, जिनगर, छायाचित्रकार, तैल चित्रकार, पत्रपंडित, वादविवादपटू, शिक्षक, संपादक, नाटककार, टंकलेखक, समाजसुधारक, चळवळे, वक्ते, नेते, पटकथा-संवाद लेखक, चरित्रकार नि इतिहासकार अशा विविध भूमिका त्यांनी वठविल्या. अशा ह्या महाभागाच्या गतिशील जीवनात अनेक संकटे कोसळली. लाभहानीचे व सुखदुःखाचे प्रसंग उद्भवले. संघर्ष नि संगर झाले. त्यांना निधडेपणाने तोंड देऊन त्यांवर त्यांनी जी मात केली, त्याचे ठसठसीत, रसरशीत नि प्रभावी कथन करणारी ही `जीवनगाथा` आहे. गोव्यापासून नागपूरपर्यंत सर्व महाराष्ट्र पायाखाली घालून महाराष्ट्रातील समाजाचे प्रत्यक्ष निरीक्षण केलेल्या महाराष्ट्राच्या एका पराक्रमी पुत्राच्या ह्या आठवणी आहेत.
प्रबोधनकारांची ही `जीवनगाथा` प्रसंगोपात सहज स्फुरलेल्या विविध प्रकारच्या आठवणींना एकत्र गुंफून तयार केलेली आहे. ती एक आटोपशीर कलाकृती असली तरी तिची मांडणी काही स्थळी, कालानुक्रमांच्या अभावी जितकी सुसंगत, बांधीव व प्रमाणबद्ध व्हावयास पाहिजे होती तितकी होऊ शकली नाही. त्याचे कारण आत्मचरित्र लिहावे अशी त्यांना आयुष्याच्या सोनेरी सायंकाळीही विशेष इच्छा झाली नव्हती वा उत्सुकता वाट्त नव्हती, हे होय.
आत्मचरित्र व आठवणी ह्यांत जरी अनेक गोष्टीत साम्य असले, तरी त्यांत एक महत्त्वाचा फरक असतो. आठवणीत अवतीभोवतीच्या परिस्थितीवर व बाह्य घटनांवर अधिक भर दिलेला असतो, तर आत्मचरित्रात आत्मचरित्रकाराच्या अंतरंगावर, आत्मपरीक्षणावर नि मनोविश्लेषणावर प्रकाश टाकलेला असतो. त्यात मनातील व्यापारांचे, कंगोऱ्यांचे नि अंतःसृष्टीतील स्थित्यंतरांचे विश्लेषण असते. आणखी असे की, निरपवाद, निर्भेळ सत्य हा आत्मचरित्राचा प्राण असतो. मनुष्य स्वभाव असा असतो की आत्मचरित्रकार स्वतःच्या कामाविषयक, अनैतिक, अप्रिय, लबाडीच्या गुप्त गोष्टी आडपडदा न ठेवता अगदी विवस्त्र स्वरूपात प्रकट करू शकत नाही. सभ्यपणा, सौजन्य व समंजसपणा बाळगून आणि आप्तांच्या व इष्टमित्रांच्या भावनांची कदर करून बहुधा आत्मचरित्रे लिहिली जातात.
यास्तव सर्वांगपूर्ण व सर्वस्वी निर्दोष, निर्मळ नि नितळ स्वरूपाचे आत्मचरित्र केव्हाही प्रकाशात येऊ शकत नाही, असे म्हटले तरी चालेल. अपूर्णता हा मानवी सृष्टीचा नियम आहे. हे जाणूनच सूज्ञ व्यक्ती अटळ असलेला आत्मगौरव, परनिंदा व अतिशयोक्ती शक्य तो टाळण्याचा प्रयत्न करून आत्मचरित्र वा आठवणी प्रसिद्ध करतात. स्वदोषांविषयी व परदोषांविषयी पराकोटीची घृणा व्यक्त केलेली आत्मचरित्रे विरळच. मात्र स्वतःच्या भग्न मनाला वा संसाराला प्रसिद्धीचा विरंगुळा लाभावा म्हणून फक्त आप्तमित्रांच्या
चारित्र्यावर लालभडक झोत टाकून सहानुभवी व्यक्तीकडून आत्मगौरव साधणाऱ्या काही व्यक्ती आठवणी प्रसिद्ध करतात, हे काही खोटे नाही.
आपली जीवनयात्रा आपण कशी केली हे कथन करताना प्रबोधनकारांनी आपल्या जीवनाचे एक सूत्र सांगून टाकले आहे. ते सूत्र म्हणजे “जन्मप्राप्त नि कर्मप्राप्त व्यवहाराच्या रंगभूमीवर पडेल ती भूमिका उत्तम वठविण्यांची धडपड करणारा (मी) एक धडपड्या नाटक्या" हे होय. ह्या `जीवनगाथे’चे एक वैशिष्ट्य आहे ते असे की, ह्या आठवणी त्यांनी कर्तव्यबुद्धीने व कृतार्थ भावनेने कथन केल्या आहेत. त्यांच्या जीवनाशी ज्या ज्या व्यक्तींचा संबंध आला, ज्या ज्या घटना घडविण्यात त्यांनी भाग घेतला, ज्या ज्या इतर घटना वा इतिहास घडताना त्यांनी पाहिला, त्यांचे त्यांचे त्यांनी कथन व चित्रण मनमोकळेपणाने केले आहे. त्यात त्यांनी तत्कालीन समाज, रूढी, परंपरा, रीतिरिवाज, ग्रामीण जीवन ह्यांच्या स्थित्यंतरांची रसभरित व मनोवेधक दृश्ये रेखाटली आहेत. त्यात काही जनतेच्या कैवाऱ्यांची, अज्ञात, सच्च्या व त्यागी अशा अनेक समाजसेवकांची, नाट्य, कला व काव्य या क्षेत्रांतील महानुभावांची, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांतील कर्मयोग्यांची हृदयंगम शब्दचित्रे व व्यक्तिदर्शने घडविली आहेत. त्यांवरून आपल्या कालखंडाचे प्रबोधनकार कसे डोळस सांक्षी आहेत, हे मनावर ठसते.
`जीवनगाथे`तील समाज-स्थित्यंतरांचा तपशील उद्बोधक व मनोरंजक आहे. मराठी समाजाच्या जीवनात, आचारविचारांत, खाण्यापिण्यात व रहाणीत आरपार बदल झाला. जुन्या काळी पायात जोडा किंवा चप्पल घालून रस्त्याने चालण्याची महिलांची हिम्मत नव्हती. रखेल्यांची रूढी प्रतिष्ठित गणली जाई. नाटकात काम करणाऱ्या महिलांना तिरस्काराने `रांडा` म्हणत, तर आता नटींना गौरवाने `देवी` म्हणतात. शेंडीचे घेरे छाटून चेहरे राखू लागल्याचे ते दिवस. बैलगाडी व टांगा, छकडा, रेकला नि पांढरी हॅट घातलेल्या घोड्यांची ट्रामगाडी, यांचे युंग बदलले. एकत्र कुटुंब पद्धतीचे तीन तेरा होऊ लागले. ग्रामोफोनने गायकीत क्रांती केली. `पुण्याच्या टिळकाने गणपती दैवत चव्हाट्यावर आणून ठेवले` म्हणून प्लेग झाला, ही अज्ञानी समजूत ठाण मांडून बसली होती. हुंडा पद्धतीने अनर्थ उडविला होता. जरठ-बाला विवाहांनी कहर उडविला होता. ह्यांची माहिती व कहाणी या जीवनगाथेत भरपूर आहे.
आपण वकील व्हावे अशी महत्त्वाकांक्षा प्रबोधनकारांनी आपल्या विद्यार्थीदशेत बाळगली होती. वडील बेलीफ, घरची परिस्थिती नेहमीच ओढघस्त. `हातावर मिळवायचे नि तळहातावर खायचे.` शिक्षणासाठी अनेक ठिकाणी त्यांना अतिशय धडपड करावी लागली. अत्यंत दुःख नि अडचणी सोसाव्या लागल्या. परंतु ह्या हुशार, हरहुन्नरी नि बुद्धिवान विद्यार्थ्याचा दुर्दैवाने सर्वत्र पाठलाग केला. प्रवेश फीत दीड रुपया कमी पडल्यामुळे त्यांची मॅट्रिकची परीक्षा हुकली!
तथापि प्रबोधनकारांची ज्ञानलालसा एवढी प्रचंड, तळमळ एवढी प्रबळ की, त्यांनी स्वाध्यायाच्या बळावर जे ज्ञान संपादन केले ते विश्वविद्यालयाची डॉक्टरेट संपादन केलेल्या दोन-चार पंडितांच्या व्यासंगाएवढे अफाट आहे. आपल्या मासिक वेतनाचा मोठा भाग त्यांनी ग्रंथ विकत घेण्याच्या छंदात उधळला. शेक्सपियरच्या वाङमयातील सुभाषितांचा नि वचनांचा कोश करणारा हा व्यासंगी! दुर्मिळ ग्रंथ नकलून घेण्यासाठी सफेरी करणारा हा ज्ञानी पुरुष! याचा पगाराचा दिवस उजाडला की आई-आजीच्या पोटात चिंतेचा गोळा उठे. हा ज्ञान-वेडा `दादा` आज पुस्तकाच्या `पिठ्यात` जाऊन बेहोष होईल आणि त्या धुंदीत पगाराची पुरी वाट लावील, म्हणून आजी दादाच्या मित्राच्या घरी जाऊन त्याला सायंकाळी गुंगवून, मथवून घरी आणावयास विनवणी करी. वाडिया महाविद्यालयात व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे इतिहास संशोधन मंडळ यांची ग्रंथसंग्रहालये त्यांच्या अखंड ज्ञानयज्ञाची ग्वाही देत राहतील.
प्रबोधनकारांच्या महत्त्वाकांक्षेप्रमाणे त्यांना वकील होता आले नाही. त्यामुळे त्यांचे काही बिघडले असे नाही. `माणसाने एकमार्गी नसावे, अंगात हरहुन्नर पाहिजे. पडेल ते काम अंगमेहनतीने पार पाडण्याची शहामत पाहिजे` असा त्यांचा बाणा. तो बाणा अक्षरशः पाळून त्यांनी आपल्या लेखणीने, वक्तृत्वाने व कर्तृत्वाने आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले. त्यांना वकील होता आले नाही तरी त्यांनी आपल्या निष्काम बुद्धीने, तळमळीने, हिरीरीने अस्पृश्य गणलेल्या बंधुजनांची, गरिबांची, दलितांची, कामगारांची नि शेतकऱ्यांची सेवा केली हे त्यांना भूषणास्पद आहे.
दैविक, चित्तथरारक चमत्कार करणारे प्रबोधनकारांचे आजोबा हे एक उपासक, साधुशील, भक्तिमार्गी पुरुष होते. आजन्म लोकसेवेचे व्रत घेतलेली त्यांची आजी एक बेडर नि बंडखोर समाजसेविका होती. अस्पृश्यता पाळणे तिच्या गावी नव्हते. महाराची सावली पडली तर मनुष्य महार होतो, मग ब्राह्मणाची सावली पडली तर तो ब्राह्मण होतो काय, अशी ती खोचक प्रश्न विचारी. काही वर्षांपूर्वी प्रचंड खळबळ उडविणाऱ्या `खरा ब्राह्मण` ह्या प्रबोधनकारांच्या नाटकाचे बीज त्यांच्या आजीच्या ह्या शिकवणीत आहे. त्यांचे वडील बेलीफ होते पण प्रवृत्तीने ते होते कलाकार. दरसाल गणपती उत्सवात ते कळसूत्री देखावे करून लोकांची करमणूक करीत.
आजी, आजोबा व वडील यांच्यापासून प्रबोधनकारांना लोकसेवा, धर्मसेवा व कलोपासना यांचे धडे मिळाले. परंतु त्यांच्या जीवनावर मातेच्या तेजस्वी स्वाभिमानाचा व कडक शिस्तीचा मोठा प्रभाव पडलेला आहे. ते मातृभक्त आहेत. आपल्या मातेविषयी ते मुक्तकंठाने म्हणतात: “सामाजिक, बौद्धिक नि सार्वजनिक पातळीवर आम्ही आहोत, त्याचे सारे श्रेय आमच्या मातोश्रीच्या कर्तबगार व कडक शिस्तीला आहे. खोट्याची, दंभाची, अहंतेची नि कोरड्या फुशारकीची तिला मनस्वी चीड यायची.”
प्रबोधनकार म्हणतात, `आपला पिंड राजकारणी नसून समाजकारणी आहे.` आणि समाजकारणात जो ढवळाढवळ करतो त्याचा वर्णवर्चस्ववादी ब्राह्मण तिरस्कार करतात. जे जे सामाजिक समतेच्या महान मूल्याच्या प्रस्थापनेसाठी झगडले, ते ते लोकाग्रणी ब्राह्मणांच्या रोषास पात्र ठरले. लोकहितवादी, आगरकर, राजारामशास्त्री भागवत, बाळशास्त्री जांभेकर नि सावरकरही त्यामुळे अप्रिय झाले, मग प्रबोधनकारांचा त्यांनी द्वेष केला यात नवल ते काय? त्याविषयी प्रबोधनकार आपल्या `जीवनगाथे`त म्हणतात: “मी ब्राह्मणांचा द्वेष्टा, अशी कण्डी मत्सरी भटांनी पिकविलेली आहे. नकली, खोट्या नि दांभिक भटाबामणांचा मी खास द्वेष्टा आहे. तसा द्वेष सगळ्यांनी करावा असे मला वाटते. पण जो खरा ब्राह्मण आहे, वाणाचे सर्व विहित कर्तव्य पाळतो. तो मला केव्हाही वंद्य नि पूजनीय असणार.’’
आपल्या देव्हाऱ्यात `वीर` आणि `ब्राह्मण` असे चांदीचे दोन टाक पुजले जातात असे सांगणारे व जातीजातीचा विचार न करता मान्यवरांचा मान राखणारे प्रबोधनकार ब्राह्मणांविषयी प्रशंसोद्गार काढताना म्हणतात: “कालमानाप्रमाणे आचारविचारात झटपट बदल करण्याची क्षमता आणि गुणग्राहकता बामणांच्या नव्या पिढीत इतरांपेक्षा खास विशेष आहे. बालपणापासून तो आजवर माझ्या अवतीभोवती ब्राह्मणेतर किंवा स्वजातीच्या स्नेहीसोबत्यांपेक्षा ब्राह्मण मित्रांचाच भरणा फार." आहे की नाही गंमत?
प्रबोधनकारांच्या ह्या आत्मवृत्तात त्यांच्यातील सहनुभूती नि गुणग्राहकता, निर्भयता नि संयम यांचे चांगले दर्शन घडते, ते स्वतः कलावंत, रसिक, रंगेल नि रंगेल असल्यामुळे `जीवनगाथे`च्या लेखनात आकर्षक रंग व रेषा भरल्या आहेत. त्यात कृत्रिमता नाही; ते बुद्ध्या खुलवून, सजवून लिहिलेले नाही. शैली नि कलाकृती एकरूप झालेली आहेत. भाषा सरळ व सुबोध, कसदार नि ओघवती आहे. तीवर प्रबोधनकारांनी नाटक कंपन्यांबरोबर नि व्याख्यानासाठी केलेल्या भ्रमंतीत ज्या बोली ऐकल्या त्यांचाही परिणाम झालेला आहे असे वाटते. ती उपहास करते तरी विखारी नाही. ती आहे ढंगदार नि वीरश्रीयुक्त.
ही `जीवनगाथा` कृतज्ञतेने ओसंडलेली आहे. प्रबोधनकारांनी लोकहितवादींना परात्पर गुरू मानून त्यांना मानाचा पहिला मुजरा केला आहे., त्यांनी गुरुपदाचा मान `केरळ कोकीळ`कार कृष्णाजी नारायण-आठल्ये यांना दिला आहे. आपल्या बौद्धिक प्रगतीचे श्रेय त्यांनी देवासमधील व्हिक्टोरिया हायस्कूलच्या गंगाधर नारायण शास्त्रीबुवा यांना दिले आहे आणि मार्गदर्शकाचा मान वडिलांचे मामा राजाराम गडकरी वकील यांना दिला आहे. गंगाधर शास्त्रीबुवा यांनी गोल्डस्मिथचे `डेझर्टेड व्हिलेज` इतक्या तन्मयतेने शिकविले की पुढे प्रबोधनकारांच्या `शेतकऱ्यांचे स्वराज्य` ह्या ग्रंथातून ती शिकवण प्रगट झाली.
ह्या `जीवनगाथे`तील राजर्षी शाहू छत्रपती यांचे नेतृत्व नि व्यक्तिमत्त्व, कर्मवीर भाऊराव पाटलांचे शैक्षणिक कार्य, कृष्णराव गोरे यांच्या गाण्याच्या तबकड्या, ब्राह्मणेतर चळवळीतील `कोंबडझुंजी`, इतिहासकार राजवाड्यांच्या जात्याभिमानी लेखनाचा ब्राह्मणेतर चळवळीवर झालेला परिणाम, डॉ. दत्तात्रय कृष्ण कोल्हटकर यांच्या मुलीचा अमेरिकेतील पुनर्जन्म, नाथमाधवांचा आजारीपणा व लेखन, गांधीजींच्या दोन गाठी-भेटी, फैजपूर काँग्रेस यांची वर्णने मुळातच वाचावी. `सत्यनारायणाची पूजा,` `व्यंकटेशस्तोत्र`, `शनिमहात्म्य` आणि महाराष्ट्रीय संतांचे कार्य ह्यांविषयी प्रबोधनकारांची मते अवश्य वाचावी. हिंदु समाजाची पुनर्घटना व हिंदु संघटना ह्या विषयांवरील त्यांचे विचार मननीय आहेत.
प्रबोधनकारांनी लहानमोठे सुमारे पंचवीस ग्रंथ लिहिले. त्यांतील `कोदंडाचा टणत्कार`, `खरा ब्राह्मण` (नाटक), ‘ग्रामण्यांचा इतिहास`, `रंगो बापूजी`, `वक्तृत्व शास्त्र` व `भिक्षुकशाहीचे बंड` हे त्यांचे ग्रंथ विख्यात आहेत. इतर ग्रंथ व पुस्तिका त्या त्या काळी गाजल्या. तथापि साहित्यातील झब्बुशाहीने ह्या व्यासंगी विद्वानाला नि निःस्पृह साहित्यिकाला साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान काही दिला नाही.
प्रबोधनकारांच्या आत्मकथेत दोन व्यसनांचा उल्लेख आहे. एक `बुकबाजी`चे व दुसरे ‘तपकिरी’चे. व्हिस्की वा ब्रँडी यांच्या आहारी न जाता, ती सोडावी असे वाटते तेव्हा जुने वस्त्र टाकावे तशी ते ती टाकतात. `जीवनगाथे`त प्रबोधनकारांच्या स्वतःच्या संसारातील घरगुती स्वरूपाच्या व गृहप्रपंचाच्या गोष्टींवर भर दिलेला नाही. त्याचे कारणही तसेच सयुक्तिक दिसते. त्यांच्या पत्नीनेच सारा गृहप्रपंच चालविला. जे काही मिळवायचे ते पत्नीच्या स्वाधीन करावयाचे की काम संपले! नातलग, पै पाहुणे यांची सरबराई गृहणीने यथाशक्ती करावयाची. प्रबोधनकार आपले सदानकदा लेखनात, मित्रांशी नि कार्यकर्त्याशी चर्चा करण्यात गर्क. शिवाय एकत्र कुटुंब पद्धतीतील वडीलधाऱ्या मंडळींसमोर पाळावयाची त्या काळची काही बंधने व लेखनातील संयम हेही एक कारण असू शकेल.
प्रबोधनकार वयाच्या ८८ व्या वर्षीसुद्धा फारसे त्रासिक, उदास व असमाधानी दिसत नाहीत. ते शरपंजरी पडले असले तरी त्यांचे मनोबळ नि उत्साह वाखाणण्यासारखा आहे. विजिगीषू पुत्राचे वाढते वैभव, नेतृत्व व कर्तृत्व आणि सुनेची शालीनता, सुशीलता व सत्कार्यप्रवृत्ती पाहून त्यांना धन्यता वाटत असते. निवृत्तीचे सुख समाधानाने उपभोगीत असले, तरी ते मूलतः प्रवृत्तिमार्गी असल्यामुळे कार्यकर्त्यांना नि तरुणांना सतत प्रेरक व पोषक असाच उपदेश करीत असतात. प्रचंड मेणबत्तीसारखे शेवटच्या अंकापर्यंत त्यांनी आपले सर्वस्व वेचून ती तन्मयतेने वठविली आहे.
`माझी जीवनगाथा` हे आत्मचरित्र प्रसिद्ध करून सोमैया प्रकाशनाने मराठी आत्मचरित्र वाङ्मयात ठसठशीत व मोलाची भर घातली आहे.
- धनंजय कीर
दि. ३ सप्टेंबर १९७३.
७७ भागेश्वर भुवन, दिलीप गुप्ते रोड,
माहीम, मुंबई - १६.
दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना
सत्यशोधक प्रबोधनकार
प्रबोधनकार ठाकरे हे सत्यशोधक चळवळीचे एक प्रमुख आणि प्रखर प्रवक्ते होते. या विचारप्रणालीच्या प्रसारासाठीच त्यांनी `प्रबोधन` हे नियतकालिक अनेक वर्ष प्रकाशित आणि संपादित केले. कडक आणि प्रसंगोपात भडकही होणाऱ्या त्यांच्या लेखनशैलीमुळे `प्रबोधन` त्या काळात खूपच गाजले आणि त्यातूनच `प्रबोधनकार` ही पदवी त्यांना प्राप्त झाली. वृत्तपत्रातील त्यांची कर्तबगारी ज्यांच्या नावाशी कायमची निगडित झाली आहे असे जे थोड़े पत्रकार महाराष्ट्रात होऊन गेले आहेत त्यात प्रबोधनकार हे एक प्रमुख नाव आहे. लोकहितवादींनी सूचित आणि ज्योतीराव फुल्यांनी प्रवर्तित केलेली सत्यशोधक चळवळ ही आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाची क्रांतिकारक घटना. समाज जीवनाच्या सर्व स्तरावर समतेची आणि न्यायाची स्थापना करू पहाणारी अशी सर्वस्पर्शी आणि व्यापाक चळवळ भारतात अन्यत्र कोठेच झाल्याची दिसत नाही. फुल्यांच्या समोर एक जात नव्हती. तर एक उद्दिष्ट होते ते सामाजिक न्यायाचे. म्हणून त्यांनी दलितांच्या दास्याला विरोध केला तसा ब्राह्मण विधवांच्या केशवपनालाही केला.
शिक्षणाचा प्रकाश मागासवर्गापर्यंत महिलांपर्यंत पोहचवला आणि अनौरस अपत्यांनाही आधार दिला. विवाहविधीत मराठी मंत्र आणण्याचा आणि पुरोहित कार्य ब्राह्मणेतरांकडून करून घेण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. दारिद्र्याच्या गर्तेत बुडालेला शेतकरी आणि जनावरी जीवन जगणारा कामगार यांनाही न्याय मिळवून देण्यासाठी ते झटले. समाजातील व्यवस्थेचे समग्र परिवर्तन आणि संपूर्ण शुद्धीकरण हे उद्दिष्ट फुल्यांसमोर होते, त्यासाठी सत्यशोधक आंदोलनाची आचार विचार संहिता त्यांनी तयार केली आणि तिच्या स्थापनेसाठी अजिंक्य रणशिलतेने विरोधी शक्तीशी कडवी झुंजही दिली. त्यांनी आंदोलन उभे केले. पण त्याच्या प्रसाराला त्या काळाच्याच मर्यादा होत्या. या चळवळीचा संदेश त्यांच्या हयातीत महाराष्ट्रात सर्वदूर पोहचला नव्हता. पुणे शहरही त्या काळात महाराष्ट्राची वैचारिक आणि सांस्कृतिक राजधानी होती. रेलगाडीच्या डब्यांना गती दिशा आणि नियंत्रण देणाऱ्या इंजिनसारखे पुण्याचे स्थान होते. फुले पुण्यातलेच आणि त्यांचे विरोधकही पुण्यातलेच. तेथील सनातनी आणि समेटवादी शक्तींशी मुकाबला करण्यातच फुल्यांना आपली हयात खर्ची घालावी लागली. गंगेचा अवतार गंगोत्रीत झाला, पण त्याखालील माळमैदानावर तिचे अवतरण झाले नाही.
हे कार्य फुल्यांच्या निधनानंतर दोन दशकांनी झाले. १८९० मध्ये फुले दिवंगत झाले. मधल्या काळात क्षीण झालेल्या या आंदोलनाला चेतना आणि गती देण्याची जबाबदारी कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी स्वीकारली. त्यांना साथ देऊन अथवा स्वतंत्रपणाने, ज्या विचारवंतांनी, कार्यकर्त्यांनी, पत्रपंडितांनी या विचारप्रणालीचा धूमधडाक्याने महाराष्ट्रात प्रसार केला त्यात प्रबोधनकारांची गणना प्रामुख्याने होते. शाहू महाराज आपल्या संघटना कौशल्याने आणि आर्थिक मदतीने या चळवळीला पुढे नेत होते तर प्रबोधनकार आपल्या लेखनाने आणि वक्तृत्वाने. त्यांची स्मरणयात्रा या पुस्तकाच्याद्वारे आता मराठी वाचकांना उपलब्ध होत आहे. समाजपरिवर्तनाचा ध्वज खांद्यावर वाहणारे हे व्यक्तित्व किती मनस्वी बहुरंगी आणि जिद्दीचे होते, याचा प्रत्यय या आठवणींवरून येतो.
प्रारंभीच्या काळात दारिद्र्याचे दशावतार बघावे लागले. अनेक आघात सहन करावे लागले. संसारात पाय रोवून स्थिर होण्यासाठी परस्परांशी संबंध नसलेले अनेक व्यवसाय स्वीकारावे लागले. विविध व्यवसायांतील त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. चित्रकला, नाट्य, टंकलेखन, छायाचित्रण अशा अनेक क्षेत्रात त्यांची प्रतिभा सहजतेने संचार करीत होती. पण हे सर्व करीत असता त्यांचे मार्गक्रमण चालू होते ते त्या `एकच तारा`च्या दिशेने. तो तारा होता. समाज परिवर्तनाचा, अन्याय निवारणाचा, लोकहितवादींच्या लेखनाचा प्रभाव त्यांच्यावर प्रथम पासून होता. पुढील काळातील त्यांचे वाचन तर अफाटच होते. कधीही न सुटलेले आपले व्यसन म्हणजे `बुकबाजी`चे असे त्यांनी सांगितले आहे. फुले, आगरकर, रानडे त्यांनी पचवले. त्याप्रमाणे इंग्रजीतील शेक्सपियर सारख्या अनेक अभिजात नाटककारांचा आणि वैचारिक ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. पण सत्यशोधक मताकडे ते वळले ते पुस्तकांच्या वाचनामुळे नव्हे तर जीवनात आलेल्या प्रत्यक्ष अनुभवांमुळे. स्वाभिमान जखमी करणारे अनेक प्रसंग त्यानी अनुभवले आणि स्त्रियांवर, दलितांवर होणारे घृणास्पद अन्यायही त्यांनी पाहिले. लहानपणापासूनच त्यांचे मन या बाबतीत अतिशय संवेदनशील होते, हळवे होते आणि लढऊही होते, एका जरठबाला विवाहाच्या निषेधार्थ लग्नमंडप जाळून टाकण्याचे साहस त्यांनी कुमार वयात केले होते. ही लढाऊ न्यायनिष्ठा आणि स्वाभिमानी वृत्ती अखेरपर्यंत अबाधित राहीली.
आर्थिक विवंचना असतानांही त्यांनी आपली लेखणी द्रव्यासाठी व सन्मानासाठी कुणाच्या स्वाधीन केली नाही. शाहू महाराजांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते, पण महाराजांनी अकारण केवळ मेहेरबानी म्हणून देऊ केलेली पाच हजारांची रक्कम (त्या काळात एका इस्टेटीसारखी) चार कडक शब्दांसह त्यांनी तिथल्या तिथे परत केली. या वृत्तीमुळेच त्यांनी सत्यशोधक विचारांचा ध्वज खांद्यावर घेतला आणि त्याच्या प्रचारासाठी प्रबोधन पत्र सुरू केले. त्यांची लेखनभाषण शैली त्यांच्या वृत्तीशी मिळती जुळती म्हणजे तिखट, प्रहारशील आणि ग्रामीण आविर्भावाची होती. तात्त्विक विवेचनापेक्षा शाब्दिक आसूड उडविण्याकडे अधिक कल असलेली. या शैलीमुळेच सामान्य जनतेपर्यंत ते सहजतेने पोहचू शकले. शाहू महाराजांच्या प्रेरणेने सर्वत्र संचार करणारे सत्यशोधक जलसे आणि प्रबोधनकारांसारख्या काही लेखकांचे आक्रमक लेखन, यामुळे शहरापुरता मर्यादित असलेला सत्यशोधक विचार महाराष्ट्रातील, निदान काही भागात तरी बहुजन समाजापर्यंत पोहचला आणि बंडखोरीची हवा सर्वत्र धगधगू लागली. पण हे सर्व काही काळच टिकले. पेटविण्याच्या भरात तात्त्विक पाया सुरक्षित ठेवण्याकडे वा अधिक भक्कम करण्याकडे दुर्लक्ष झाले. पुढे सत्यशोधक विचारप्रणालीतील एक एक कलम बाद होत गेले आणि त्या सर्वस्पर्शी चळवळीचे रूपांतर ब्राह्मणेतर चळवळीत झाले. ते ही पर्व संपले आणि ब्राह्मणेतर चळवळीचे काँग्रेसच्या अधिक व्यापक अशा राष्ट्रीय आंदोलनात विसर्जन झाले. हे विसर्जन ऐतिहासिकदृष्ट्या आवश्यक आणि अपरिहार्य होते. तरी पण हेही खरे की सामाजिक क्रांतीच्या आणि शुद्धीकरणाच्या दिशेने जाणारा एक आशादायक प्रवाह खंडित झाला. केवळ खंडित झाला असे नाही तर शेवाळून गेला. परिणामतः दोन पावले पुढे गेलेली सामाजिक मानसिकता आता चार पावले मागे सरकली आहे. नागरिक शील बांधण्याचा प्रयत्न मागे पडला असून जातीय संघर्ष, अंधश्रद्धा, असहिष्णूता, भ्रष्टाचार, गुंडानुयय, नीतिहीन सत्तालालसा अशा अनिष्ठांना ऊत आला आहे. संकुचित निष्ठांच्या उद्रेकांनी आकाश अंधारल्यासारखे झाले आहे. आता देश पुन्हा प्रतीक्षेत आहे नव्या सत्यशोधक आंदोलनाच्या या प्रतीक्षेला प्रबोधनकारांच्या या आत्मवृत्ताचा आधार मिळावा.
- कुसुमाग्रज
प्रकरण १
सिंहावलोकन
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातला मी आदमी. (जन्म दिनांक १७ सप्टेंबर १८८५ पनवेल, जिल्हा कुलाबा) वयाच्या ७ व्या वर्षापासून वर्तमानपत्रे वाचण्याचा छंद लागला. त्या काळी `मुंबई वैभव` हे मराठी रोजचे पत्र पनवेलीस माझ्या (मातुल) आजोळी यायचे. त्याशिवाय `इंद्रप्रकाश` हरिभाऊ आपट्यांची करमणूक `केरळकोकीळ` मासिक, ठाण्याचा `जगत्समाचार` अशी काही पत्रे कोणा ना कोणाकडे येत असत. ती पत्रे आई मागवून आणायची नि माझ्याकडून वाचवून घ्यायची. म्हणजे १८९२ पासूनच स्मरणशक्तीला धार लागत गेली. आजही मी त्याकाळापासूनचा महाराष्ट्रातील घडामोडींचा इतिहास स्मरणाने छान सांगू शकतो. त्याकाळची वृत्तपत्रे काय किंवा मराठी लहानमोठी पुस्तके काय, आतासारखी एकमेकांचा शिमगा करणारी नसत. इतरांनी शिकून शहाणे व्हावे. एवढ्यासाठी त्याकाळचे लेखक व वक्ते लिहीत बोलत असत. आत्ताचे, आम्ही किती जाडजूड शहाणे आहोत, याचे प्रदर्शन करण्याकरिता लिहीत बोलत असतो.
गेल्या ८० वर्षांत मऱ्हाठी समाजाची विलक्षण स्थित्यंतरे झाली. लोकांचे आचार विचार, खाणेपिणे, रहाणी इतकी आरपार बदलली आहे की, गतकाळातली काही समाजचित्रे आज जर त्यांच्यापुढे धरली तर आमचे बापदादे खरोखरच का इतके मूढ, गलथान, अडाणी आणि हव्या त्या परिस्थितीत अल्पसंतोष मानणारे होते? असा अचंबा व्यक्त केल्याशिवाय ते रहाणार नाहीत. पायांत जोडा अगर चप्पल घालून रस्त्याने चालण्याची त्याकाळच्या महिलांची काय छाती होती! उन्हाळ्याचा भर कडाका का असेना, बायकांनी अनवाणीच चालले पाहिजे, असा सभ्यांचा दण्डक असे. असे न करणारी बाई बेधडक हुंडगी किंवा वेश्या सदरात पडत असे. माझ्या आयुष्यात मी पाहिलेली, अनुभवलेली समाजचित्रे कितीतरी आहेत. प्रसंगोपात स्नेही मंडळींच्या बैठकीत वरचेवर त्यांची शब्दचित्रे मला काढावी लागतात. दिवंगत अनेक थोरथोर लोकांच्या परिचयाचा लाभ मला झालेला आहे.
गोव्यापासून नागपुरापर्यंत बहुतेक महाराष्ट्रात मी फिरलो आहे. लहानमोठ्या खालच्या, मधल्या नि वरच्या थरांतील अनेक समाजांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले आहे. त्यांच्या गुणदोषांनी माझा आठवणींचा बटवा भरगच्च भरलेला आहे. भेटीला येणाऱ्या अनेक स्नेहीसोबत्यापुढे वरचेवर वानगीदाखल कधीमधी त्यातल्या चिजा मला बाहेर काढव्या लागतात. त्यांनी ऐकल्या म्हणजे "ठाकरे, तुम्ही लिहा बुवा एकदा आपले आत्मचरित्र आणि त्यात घेऊया हे सारे मनोरंजक तपशील" असा आग्रह आज गेली निदान पंचवीस-तीस वर्षे सारखा होत असतो. माझ्यासारख्या सामाऱ्यातल्या सामान्य माणसाचे आत्मचरित्र आणखी ते काय असणार? चरित्र लिहिण्यासारखे असे काय आहे माझ्यात? या भ्रांतीमुळे आजवर मी त्या आग्रहाकडे पाठच फिरवून बसलो होतो. तथापि, तोही माझा पिछा सोडीना म्हणून मध्यंतरी जुऱ्या आठवणी आठवतील तशा लिहून काढल्या आणि दैनिक `लोकमाऱ्या`त छापण्याचा उपद्व्याप केला. अलिकडे चिरंजीवांच्या `मार्मिक` साप्ताहिकातही देण्याचा उपक्रम केला.
सगळीकडून त्या अखंड चालू ठेवण्याबद्दल आग्रहाची शेकडो पत्रे येत असतात, कारण काय? तर त्यात जुऱ्या जमाऱ्यातल्या समाजचित्राचा `इतिहास` असतो. तो टिकवला पाहिजे, गेल्या पाऊणशे वर्षात महाराष्ट्राने सामाजिक, राजकारणी, धार्मिक, आर्थिक इत्यादी क्षेत्रांत कोणकोणत्या स्थित्यंतरांतून प्रवास केला, याचा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला, अनुभवलेला इतिहास, चरित्र म्हणा, आयुष्यातले टप्पे म्हणा, अथवा सिंहावलोकन म्हणा, त्यात लिहिला जावा. ह्या स्नेही मंडळींच्या सूचनेवरून हा उद्योग मी करीत आहे. आयुष्याच्या अखेरच्या सीमारेषेवर मी उभा असल्याचा भास मला होत आहे. दृष्टीसकट इतर शरीरावयांची नि माझी झपाट्याने फारकत झाली आहे, नित्य होत आहे. लिहिणारा उजवा हात तर पंचवीस-तीस वर्षांपूर्वीच राम-राम ठोकून लंजूर झाला. इंग्रजी, मऱ्हाठी टाइपरायटर हे दोघे आजवर इमानी दोस्तांप्रमाणे माझ्या हाकेला हाक देत असतात. त्यांच्या सहाय्याने ही आठवणींच्या फुलांची ओंजळ मराठी जनताजनार्दनाच्या चरणांवर यथाशक्ती यथाकाळ वाहण्याचा उपक्रम करीत आहे.
श्रीगणेशा
मी म्हणजे कोणी मोठा वीरपुरुष आहे, जगाने माझी आठवण ठेवावी, किंवा माझ्या चरित्राचे पारायण करावे अशा भावनेची झुळूकसुद्धा माझ्या मनाला शिवलेली नाही. मी एक नाटक्या आहे. जन्मप्राप्त नि कर्मप्राप्त व्यवहाराच्या रंगभूमीवर पडेल ती भूमिका उत्तम वठविण्याची धडपड करणारा मी एक धडपड्या आहे. मी कोण आहे. माझी भूमिका काय आहे नि माझ्याकडून इतरांनी कशाची अपेक्षा करावी इत्यादी प्रश्न जीवमान काळात सोडविणे कठीण आहे. माझी जीवनयात्रा मी कशी केली. एवढेच फार तर मला सांगता येईल आणि तेवढेच काम मी करणार आहे.
वडिलार्जित परिस्थिती
आधीच आमचे ठाकरे घराणे फार गरिबीचे. गेल्या तीन-चार पिढ्यांत आम्हांला कोठे इंचभर जमीनजुमला असल्याचे माहीत नाही. नाही म्हणायला, माझा जन्म झाला त्या पनवेल गावात आमचे झोपडेवजा घर होते. माझा विद्याभ्यास गरिबीतच झाला आणि गरिबीच्या कडेलोट कठोरतेचे यच्चयावत सगळे आघात अनुभवण्याचा मान मला लाभलेला आहे. खडतर काटेरी जीवनाचा मार्ग निश्चित ध्येयाने नि धिटाईने चोखाळीत असता, व्यवहाराचे जे टक्केटोणपे मी खाल्ले, भिन्न भिन्न स्वभावांच्या हजारो लोकांचा जो बरावाईट अनुभव आला, समाजसेवा करीत असता ठिकठिकाणच्या निरनिराळ्या समाजांची जी पाहणी झाली, मुर्दाड संकटांचा फडशा पाडताना देहमनाची सालटी कसकशी सोलवटली आणि या सर्वांचा माझ्या चरित्राच्या कमावणीवर कसकसा परिणाम झाला, याची माहिती दिली असता, नवीन जीवनाच्या नवीन पिढीला, तो जुऱ्या पिढीच्या जीवनाचा सर्वांगीण इतिहास उपदेशक किंवा उत्तेजक झाला नाही, तरी निदान मनोरंजन होईल, अशी मला उमेद आहे.
पार्श्वभाग
चित्राला जसा पार्श्वभाग, तसा व्यक्तीच्या चरित्राला पूर्वजांचा इतिहास. तो कळल्याशिवाय त्या व्यक्तीच्या बऱ्यावाईट चरित्राचा नि चारित्र्याचा नीट अंदाज लागत नाही. मी कोण, याचा अंदाज मी कोणाचा कोण, यावरून छान ठरविला जाईल. मी बड़ा बापका बेटा नव्हे हे माझे मोठे सुदैव समजतो. मी `बडबड्या` असेन, नव्हे आहेच आहे. पण `बडा` मात्र खास नाही. माझ्या आजूबाजूच्या मित्रांना नि नातेवाइकांना माझ्यात जे अनेक दोष दिसतात. स्वभावात जी तापट बेफिकिरी नि बेसंसारी चमक आढळते आणि व्यवहाराचे किंवा पैशाअडक्याचे प्रश्न हाताळताना जी त्यागी ऊर्फ उधळी प्रवृत्ती पदोपदी सर्वांना त्रासदायक होते, ती कमाई माझी स्वतःची आहे. का तिचे मूळ माझ्या कोणत्या तरी पूर्वजाच्या कोणत्या तरी स्वभाव वैचित्र्यापर्यंत जाऊन भिडते, याचाही अंदाज या प्रकरणात घेणे अगत्याचे आहे. आधुनिक शास्त्रज्ञांनी आनुवंशिक संस्कारांची अव्यवहार्यता कितीही सिद्ध केलेली असली, तरी माझा अनुभव तिचे महत्त्व नि आवश्यकताच सिद्ध करीत आहे. जसे बीज तसे फळ, हा सिद्धांत सनातनच समजला पाहिजे.
धोडपचा किल्लेदार
ठाकरे मूळचे भोर संस्थानातील पाली गावचे, तेथे आजही काही ठाकरे घराणी असावीत. पण आमचा व या पालकर ठाकऱ्यांचा आडनावापलीकडे फारसा संबंध कधीच आलेला नाही. धोडपकर असेही आमचे जादा आडनाव आहे. पण आमचे वडील किंवा ठाकरे बंधू या आडनावाच्या आडवळणाला फारसे कधी गेलो नाही. नाशिक जिल्ह्यात धोडप नावाचा किल्ला आहे. तेथे आमच्यापैकी एक पूर्वज किल्लेदार होते. इंग्रजानी या किल्ल्याला वेढा दिला. बरेच दिवस या धोडपकराने त्यांना दाद दिली नाही. किल्ल्यावर दाणा-वैरण होती तोवर त्याने तग धरला. अखेर निकराच्या चकमकीत तो ठार झाला. तेव्हापासून धोडपकर हे आडनाव आमच्या घराण्याला चिकटले. मात्र सगळेच ठाकरे धोडपकर नाहीत. या एका हकिकतीशिवाय धोडप गावाशी आमचा काहीच संबंध असल्याचे दिसत नाही.
ठाकरेकुळात ब्राह्मण-पूजन
दुसरी एक दंतकथा अशी आहे. किल्ला पडण्याची वेळ आली. सगळे सैन्य फडशा झाले. तेव्हा किल्लेदारापुढे एक ब्राह्मण अवचित येऊन उभा राहिला. "केलास इतका पराक्रम शिकस्तीचा झाला. किल्ला पडणार. इंग्रजांची सदी जोरावर." असे म्हणून त्या ब्राह्मणाने धोडपकर किल्लेदाराला आपल्या पाठुंगळी डोळे मिटून बसायला सांगितले, त्याप्रमाणे त्याने केले. थोड्या वेळाने "उघड डोळे" म्हणताच पहातो तो. आपल्या पाली येथील वाड्याच्या चौकात! घरातल्या मंडळींना हाक मारून किल्लेदार मागे वळून पहातो तो ब्राह्मण कोठेच नाही! या गोष्टीचे स्मारक म्हणून आमच्या देव्हाऱ्यात वीर आणि ब्राह्मण असे दोन चांदीचे टाक अजून पुजले जातात.
सत्याची दंतकथा आणि दंतकथेतील सत्य, यांपैकी कोणते कितपत खरे, या प्रश्नाचा मी फारसा विचार केलेला नाही. मात्र, प्रबोधनकार ठाकरे यांच्या घराण्यात ब्राह्मण पुजला जातो, या गोष्टीचा पराचा कावळा पुष्कळजण करतील. त्याला येथेच उत्तर देऊन ठेवलेले बरे. मी ब्राह्मणाचा द्वेष्टा, अशी कण्डी मत्सरी भटाबामणांनी पिकवलेली आहे. नकली, खोटया नि दांभिक भटाबामणांचा मी खास द्वेष्टा आहे. तसा द्वेष सगळ्यांनी करावा असे मला वाटते, पण जो खरा ब्राह्मण आहे, ब्राह्मणाचे सर्व विहित कर्तव्य पाळतो. तो मला केव्हाही वंद्य नि पूजनीय असणार. मात्र ही पूजा गुलामगिरी वळणाची केव्हाही नाही, नाही व नसेल. माझे शेकडो स्नेही ब्राह्मण आहेत. जातीपातीचा विचार न करता, माऱ्याचा मान न राखण्याइतका पागलपणा माझ्या पदराला चिकटविणारेच बिनचूक पागल नि पाजी म्हणून निवडून काढावे.
जन्मतःच कोणी कोणाला द्वेष्टा असत नाही. अनुभवाने बरावाईट कोण हे ठरत असते आणि ठरवावे लागते. माझा बालपणाचा शाळकरी जीवनाचा काळ ब्राह्मणी वर्चस्वाच्या उतरंडीचा होता. पेशवाईने चित्पावनांना आलेल्या हंगामी माहात्म्याची त्यांची धुंदी ओसरत होती, पण नाहीशी झाली नव्हती. एकूणेक ब्राह्मणेतरांपेक्षा आम्ही जन्माने, कर्माने आणि संस्कृती का काय म्हणतात तिने फार वरच्या थरातले आहोत, ही त्यांची आढ्यता कायम होती. बामण मंडळी बामणेतरांना अंशतः अस्पृश्यांच्या घाटणीने वागवायची. एखाद्या ब्राह्मण शाळूसोबत्याच्या घरी प्यायला पाणी मागितले तर तो तपेलीतून आणून, ओटीच्या खाली मला उभा करून, ओंजळीत ओतायचा. शिवाय "तपेली बाहेरच असू दे रे, मी घेईन मग पाणी टाकून" असे त्याची आई घरातून बजवायची. प्रथम प्रथम मला या निराळेपणाच्या वागणुकीचा बोधच होत नसे. तो जसजसा होत गेला तसतसा पावलोपावली मी त्या बामण शाळूसोबत्यांच्या सोवळेपणाची टिंगल करू लागलो.
वयाच्या आठव्या वर्षी तर एक चीड येण्यासारखा मुकाबला घडला. वडलांच्या कचेरीतल्या समव्यवसायी मंडळींनी एका ब्राह्मण बेलिफाच्या घरी धुंदूरमासाच्या प्रातर्भोजनाचा बेत केला. वडलांनी मला बरोबर नेले. तेथे बामण सारे एका बाजूला पंगतीने आणि आम्हा बापलेकांची दोन पाने दूर एका बाजूला. शिवाय भालेराव नावाचा एक कारकून होता, त्याचे पान एकटेच आणखी दूर कां? तर म्हणे तो आकरमाशा जातीचा. वाढणाऱ्या बाया आम्हाला प्रत्येक पदार्थ किंचित दुरून आणि उंचावरून पानात टाकीत. जेवणे आटोपल्यावर माझे बाबा जेव्हा आमचे खरकटे काढायला लागले तेव्हा मात्र मी चिडलो, त्यांनी करायचा तो खुलासा केला, "हे बामण जर आपल्याशी असे निराळेपणाने वागतात, तर आपण तरी त्यांच्याशी कशाला आपलेपणाने वागावे? आपल्या घरी त्यांना तसेच वागवावे." मी कडकडालो.
एकोणिसाव्या शतकातल्या शेवटच्या दशकातला तो काळ. बामण काय किंवा बामणेतर काय, दोघेही जातिभेदाच्या जुऱ्या कल्पनांचे गुलाम, इतरांना आम्ही निराळेपणाने का वागवतो, हे बामणांना समजत नव्हते आणि आपण त्या निराळेपणाला अपंगाप्रमाणे कां जुमानतो, हे बामणेतरांना उमजत नव्हते. दोघेही रूढीचे बंदे गुलाम बामणी वरचढपणाचे माझे अनुभव पुष्कळ आहेत. ते यापुढे अनेक टप्प्यांत विखुरलेले आढळतील. पण एक गोष्ट खरी. अगदी बालपणापासून तो आजवर माझ्या अवतीभोवती बामणेतर किंवा स्वजातीच्या स्नेही सोबत्यांपेक्षा बामण मित्राचांच भरणा फार, जातगोतवाले किंवा नातेवाइकापेक्षा माझ्याशी विशेष दिल्दारीने वागणारे ब्राह्मण स्नेहीच माझ्या परिसरात नेहमी अधिक असतात. याचे मर्म एकच, कालमानाप्रमाणे आचार-विचारात झटपट बदल करण्याची क्षमता आणि गुणग्राहकता बामणांच्या नव्या पिढीत इतरांपेक्षा खास विशेष आहे.
संयुक्त कुटुंबाचे तीनतेरा
माझे पणजोबा कृष्णाजी माधव ऊर्फ आप्पासाहेब हे पूर्वी पाली येथेच असत. त्यांची मुले जगत नसत. पाठोपाठ सात-आठ मुले मेली. पुढे पालीजवळ डोंगरकपाटी कोण्डीदेवी आहे. तिची उपासना केल्यामुळे पुढील चार मुले जगली. तीन मुलगे आणि एक मुलगी. पैकी वडील मुलगा रामचंद्र (माझे आजोबा) हा देवीच्या `भिकेचा प्रसाद` म्हणून त्याचे टोपण नाव भिकोबा असे ठेवले. आजोबांनी भिकोबा धोडपकर हेच आपले नाव आमरण चालविले. आप्पा त्यावेळी घराण्यात वडील होते. वाडवडिलार्जित शेतीवाडी, वाडा, गुरेढोरे, इस्टेट चांगली धनत्तर होती. आप्पांना धाकटे दोन तीन भाऊ असावे असे समजते. आप्पांची मुले जगत नव्हती, तोवर सारे भाऊ समाधानाने एकत्र रहात होते. पण आप्पांची मुले जगू लागली असे पहाताच त्या भावांच्या अंगात वाटपाची वेताळपंचविशी फुरफुरली.
इस्टेटीची वाटपे करा, असा भावांचा ससेमिरा चालू झाला. अशा वेळी कज्जेदलाल ग्रामकंटकडी, एकदा ही बाजू तर एकदा ती बाजू असा मृदंगी थापाडेपणा करू लागले. आप्पांचे म्हणणे असे की, "वडिलोपार्जित इस्टेटीचे तुकडे पाडू नका आणि जगाला विभक्तपणा दाखवू नका. वाटेल तर प्रत्येकाने एकेक कारभार मुखत्यारीने करावा. मी नुसता सल्ला मसलत देत जाईन देखरेख करीन. पण सगळ्यांनी गुण्यागोविंदाने एका वाड्याच्या छपराखाली एका पंक्तीला जेवावे. " आप्पा घराण्यात वडील असल्यामुळे. ते आपल्यावर सामायिक रहाण्याची निष्कारण सक्ती करीत आहेत, अशा गैरसमजाने आणि ग्रामकटकांच्या चिथावणीने घरात कुरबूर नि धुसफूस चालू झाली. त्यात बायकांनी अगदी जळफळता भाग घेतला.
तंटा कसा मिटवला?
एका सणाचा योग साधून आप्पांनी सगळ्या नातेवाइकांना, गावकरी शिष्ठांना, मित्रांना आणि कुळांना मेजवानी देण्याचा बेत केला. भोजनोत्तर पानसुपारीसाठी सर्व बसले असता, आप्पांनी एक हृदयस्पर्शी भाषण करून पुढारी पंचापुढे एक दस्तत्रैवज ठेवला व त्यावर साक्षीच्या सहया करण्याची विनंती केली. त्या दस्तात, "मी आज रोजी राजीखुषीने वाडवडिलार्जित इस्टेटीच्या माझ्या भागाचा राजीनामा लिहून दिला आहे. मी आणि माझ्या स्वतःच्या वंशीचा कोणीही या पालीच्या इस्टेटीत हक्क सांगायला येणार नाही. येईल तो माझ्या रेताचा नव्हे" अशी त्यावर तलाख घातली. हा लोकविलक्षण प्रकार पहाताच भावांचा मत्सराग्नी खाडकन विझला आणि ग्रामस्थ लोकांची तोंडे उतरली. कारण आप्पा हेही एक वजनदार ग्रामस्थ पुढारीच होते. समजूत करण्याइतके आप्पांनी काही ठेवलेच नव्हते. सर्वाबरोबर आपणही पानसुपारी घेऊन आप्पा तसेच बाहेरच्याबाहेर बायको आणि तीन मुले घेऊन सड्या वस्त्रानिशी घराबाहेर पडले, ते बैलगाडीने ठाणे येथे येऊन दाखल झाले.
माझ्या पणजोबांचा आत्मसंतोषाचा हा त्याग सामान्य म्हणता येईल काय? आत्मसामर्थ्याच्या कडेलोट विश्वासाशिवाय असले धाडस कोण आडूमाडू करील? वाडवडिलांच्या कमाईवर चैनीत दिवस काढण्यापेक्षा स्वतःच्या मनगटाच्या जोरावर मिळेल ती ओली कोरडी भाकर खाण्यातच खरा पुरुषार्थ आहे. हाच त्यागवृत्तीचा संतोष माझ्या प्रवृत्तीत अतिशय प्रबळ आहे. त्यापायी माझा संसार मी वेळोवेळी धुतलेला आहे. आणि स्वाभिमानासाठी मोठमोठ्या सरकारी नि सावकारी नोकऱ्यांवरही लाथा मारलेल्या आहेत.
सत्याचा पडताळा पटला
एक दिवस आजोबांना मी विचारले, "तात्या, आपल्या जातीत प्रत्येक घराण्यात काही ना काही शेत जमीनजुमला आहेच आहे. पण आपल्याला या चंद्रमौळी घराशिवाय कुठे एक इंचभरसुद्धा जमिनीचा तुकडा नाही. हे प्रकरण काय आहे?" त्यावेळी त्यांनी आप्पांच्या इस्टेट-त्यागाची कथा मला सांगितली. पण तीतले सत्य प्रत्यक्ष पडताळून पहाण्याचा सुयोग लवकरच आला. सन १८९४-९५ च्या सुमारास, कुलस्वामिनी श्री जगदंबा कोण्डीदेवीच्या दर्शनाला जाण्याचा तात्यांनी बेत केला. लहानपणी पाली सोडली. त्यावर सारी हयात लोटली. दोन करते सवरते मुलगे नि दोन नातूही झाले. पण देवीचे दर्शन होण्याचा योगच आला नाही. तो आता म्हातारपणीतरी साधावा, उमलत्या पिढीला तो इतिहास कळावा. एवढ्यासाठीच हा बेत झाला.
त्याकाळचा प्रवास तो. बैलगाड्यांचे युग चालू होते. बैलांचा छकडा म्हणजे मोठे जलदगतीचे वाहन. घोड्यांचे टांगे फक्त शहरात नि क्वचित तालुक्याच्या ठिकाणी. पण लांबच्या प्रवासाला ते कुचकामी. आत्ताच्या सारखे घेतली बॅग का चालले मोटार आगगाडीतून. या घटनांची स्वप्नेही नव्हती कोणाला पडलेली. मुंबईच्या बाजूला आगगाडी असल्याचे आम्ही नुसते ऐकायचे. पहाण्याचा योग येणार कुठून? मुंबईला घोड्यांच्या ट्रामगाड्या अवघ्या एक आण्यात माणसाला एका टोकाहून दुसऱ्या टोकाला नेतात, हा तर मोठा नवलाचा मामला असे. बैलांचा खटारा खटर खटर करीत चालला आहे. दर दहा मैलांवर विसावा. गाडीवान बैलांना पाणी वैरण घालायचे. प्रवाश्यांनी एखाद्या प्रशस्त झाडाच्या छायेत तळ ठोकायचा. दशम्या, लाडू बाहेर काढायचे. गार वाऱ्यात विश्रांती घ्यायची, तास दीडतास गेल्यावर पुन्हा प्रवास चालू व्हायचा. लांबच्या प्रवासातल्या अडीअडचणींची यादी वडीलधाऱ्या मंडळींना अगदी तोंडपाठ असायची. पुरुषांची यादी निराळी बायकांची निराळी, त्याप्रमाणे आधी आठआठ दिवस तयारीची धामधूम चालायची. लोणच्याची बरणीसुद्धा विसरता कामा नये. प्रवासात अमुक बरोबर आणले नाही. असे होता कामा नये. ही सगळ्यांची मुख्य विवंचना.
पालीचा नि आमचा संबंध कायमचा तुटलेला होता, तरी एक भक्तिमार्गी नि देवीउपासक साधुपुरुष म्हणून आजोबांची कीर्ती कुलाबा, ठाणे जिल्ह्यात चांगलीच फैलावलेली होती. कोण्डीदेवीच्या दर्शनासाठी आम्ही येत आहोत. अशी पत्रे पालीच्या काही मंडळींना गेली. भाड्याच्या बैलांचा खटारा, आमचा खासगत छकडा, अशा थाटाने पेणमार्गे पाली यात्रेला आम्ही निघालो. आजा, आजी, आई, वडील (मातुल) आजोबा वामनराव पत्की आणि दोन भावंडे (मी आणि यशवंत). वाटेत कलेखिंडीत पी. डब्ल्यू. डी. च्या नोकरीत असलेले विनायकराव काका येऊन आम्हाला मिळाले. दोनतीन ठिकाणी तासा दीडतासाचे मुक्काम करीत. दुसऱ्या दिवशी दिवेलागणीला आम्ही पाली गावात प्रवेश केला. आधी पाठविलेल्या इसमाने तेथील धर्मशाळा झाडून सारवून स्वच्छ ठेवली होती, तेथे आमचा तळ पडला. नजीकच्या विहिरीवर हात पाय तोंड धुऊन बायका स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. आप्पा धोडपकरांचे चिरंजीव भिकोबा आले ही बातमी गावात हा हा म्हणता गेली. खेडेगावातल्या बातम्या टेलिप्रिंटरपेक्षा अधिक झपाट्याने फैलावल्या जातात. तेथला प्रत्येक असामी रॉयटरचा बाप.
झाले. भराभर गावकरी नि जुऱ्या ओळखीपाळखीचे गृहस्थ तात्यांच्या भेटीला येऊ लागले. त्यांत दोघे वृद्ध पालकर-ठाकरेही आले. तात्यांच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार केला.
पालकर-ठाकरे : आपण आलात आणि उतरला धर्मशाळेत, हे काय? लोक आम्हाला काय म्हणतील? वाडा आपला आहे तेथे चला.
तात्या : त्या वाड्यावर मला कसा काय हक्क सांगता येईल? आणि तेथे मी उतरणार तरी कसा? आप्पांची तलाख विसरून कसे चालेल मला? सांगा!
इतर गावकऱ्यांनीही खूप आग्रह केला. वाड्याचे मालक म्हणून नव्हे, पण आमचे पाहुणे म्हणून येथे यायला काय हरकत आहे? पुष्कळच आग्रह झाल्यावर, रात्री नवाच्या सुमाराला ठाकरे वाड्यात गाशा नेण्याची तात्यांची आज्ञा झाली. आमची छावणी तेथे गेली.
सकाळ उजाडताच, तात्यांनी माझा हात धरून सबंध वाडा दाखविला. पडझड झालेल्या कित्येक ठिकाणी पूर्वी काय होते, त्याच्या आठवणी सांगितल्या. पुष्कळ जुऱ्या घटनांची त्या दोन वृद्ध ठाकऱ्यांबरोबर तात्यांनी चर्चा केली. पालीचा गणपती म्हणजे अष्टविनायकांपैकी एक. महाराष्ट्राचे एक जागृत दैवत. तो मूळ ठाकरे घराण्याचा. पण पुढे भाऊबंदकीच्या भानगडीत हातचा गेला आणि सार्वजनिक झाला. त्याबाबतही विचारपूस केल्यावर गरम होऊन तात्या पालकरांना म्हणाले, "सगळं घालवलंत, एवढा कुलदैवत गणपतीसुद्धा राखता आला नाही तुम्हाला? आमच्याप्रमाणे त्यालाही घालवला घराबाहेर?"
सारांश, कृष्णाजी माधवांच्या इस्टेट-त्यागाची कहाणी केवळ दंतकथा नसून शुद्ध सत्य असल्याचा पुरावा मला प्रत्यक्षच पहायला ऐकायला मिळाला.
खुर्चीचे वकील
"आप्पा ठाण्याला आल्यावर तेथे इंग्रेजी अदालतीत वकिली चालू केली. त्यावेळी कंपनी सरकारचे ठाण्याला नुकतेच स्थिरस्थावर होत होते. निस्पृहपणाने फक्त सत्यासाठी झगडायचे आणि गोरगरिबांना ऱ्याय मिळवून यायचा. लुच्या, लफंग्या कारस्थान्यांना ओसरीवरही येऊ द्यावयाचे नाही, खोटेनाटे करायचे नाही आणि त्याचा पाठपुरावाही करायचा नाही. असे आप्पांच्या वकिलीचे धोरण असल्यामुळे, पोटापुरते देई मागणे लई नाही, हेच त्यांच्या प्राप्तीचे मान राहिले. पण याच त्यांच्या तत्त्वनिष्ठेने सरकारात मात्र त्यांचा मानमराबत वाढला. कंपनी सरकारने त्यांना खुर्चीचे वकील केले. म्हणजे त्यावेळी फक्त ऱ्यायाधीश एकटाच खुर्चीवर बसायचा. बाकीच्यांना खाली जाजमावर बसावे लागे. आता कृष्णाजी माधवांना ऱ्यायाधिशाच्या बरोबरीने खुर्चीवर बसण्याचा मान मिळाला. तो त्याकाळी फार मोठा मानला जात असे."
धोडपकरांचे पनवेलकर बनलो
सरकार दरबारी आणि समाजात आप्पांचा महिमा केवढाही मोठा असला, तरी धनसंचयाकडे त्यांनी फारसे लक्ष दिलेच नाही. वकिलीची खिशात आलेली प्राप्ती घरापर्यंत सुखरूप पोहोचेलच, अशी शाश्वती नसे. समोर जो गरजवंत येईल त्याची तात्काळ भर व्हायची. दोन मुलांना मराठी सहावीची परीक्षा पास होण्यापुरते शिक्षण मिळाले. त्याकाळच्या ग्राज्वेटगिरीची हद्द हीच ती गाठली का सरकारी कारकुनीची कामधेनू आलीच चालत पायाशी. दोघांना कोर्टात नोकऱ्या लागल्या. त्यांची लग्ने झाली. मुलीलाही डहाणूकर जयवंतांचे चांगले श्रीमंत स्थळ मिळाले. वंशवेलाचा विस्तार होत असतानाच, आप्पा दिवंगत झाले.
ठाण्याहून माझ्या आजोबांची बदली पनवेलच्या स्मॉल कॉज कोर्टात झाली. तेथे त्यांनी एक लहानसे घर बांधले आणि तेथेच पेन्शन घेऊन मरेतोवर राहिले. धोडपकरांचे आम्ही पनवेलकर बनलो. आजोबांनी आमरण जरी घोड़पकर आडनाव चालवले, तरी माझ्या वडिलांनी मात्र शाळेत नावे घालतानाच `ठाकरे` आडनावाची पुनर्घटना केली. ती आजवर चाललेली आहे.
आजोबांची जीवनयात्रा
मी देवीचा प्रसाद आहे, ही आजोबांना जाणीव झाल्यापासूनच त्यांचा कल देवीच्या उपासनेकडे वळला. ते भक्तिमार्गी होते. रोज पहाटे आणि रात्री झोपण्यापूर्वी ते खंजेरीवरची भजने मोठ्याने गात असत. तात्यांचे पहाटेचे भजन म्हणजे पनवेलच्या प्रभूआळीतील लोकांचा नियमित अलार्म गजर समजला जात असे. त्यांनी बावीस वेळा पंढरीच्या आषाढी-कार्तिकी वाऱ्या केल्या होत्या. पण जीवनाचा जोरदार ओढा देवीच्या उपासनेकडे. आमच्याकडे वार्षिक नवरात्राचा महोत्सव होत असे. तो अक्षरशः सार्वजनिक नवरात्र महोत्सवच व्हायचा आणि अष्टमीला देवीच्या दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी कुलाबा, ठाणे जिल्हे आणि मुंबईहून शेकडो स्त्रीपुरुष मुलांची मोठी यात्राच जमायची. ती हकिकत मी एका स्वतंत्र टप्पात देणार आहे. आयुष्यभर तात्यांनी दोनच ग्रंथ भक्तीने वाचले.
श्रीधरकृत रामविजय आणि हरिविजय, त्यांचे पोथीवाचन अत्यंत तल्लीनतेने होत असे. वाचताना मधूनमधून त्यांचे हुंदके ऐकू आले की खुशाल कयास बांधावा की रामविजयाचे पारायण चालू आहे. आणि हसण्याचा खोकाट चाललेला असला, की हरिविजय चालला आहे. असे ओळखावे. चातुर्मासात आमच्या अंगणातील विरुपाक्षाच्या देवळात, किंवा गावातल्या कोणत्याही देवळात भागवताचा सप्ताह असला तर तात्या अगत्याने जात असत. तन्मयतेने आणि अर्थबोध होईल असे वाचन कसे करावे हे मी तात्यांच्या पुराण वाचन शैलीवरून शिकलो. माझा जन्म होण्यापूर्वीच त्यांनी पेन्शन घेतलेले होते. तेव्हापासून त्यांचे दोन वेळा भजन, पुराण वाचन, सकाळ-संध्याकाळ पनवेलच्या सर्व देवळांचे दर्शन, गोठ्यातल्या कपिला गाईची सेवा, बागबगीच्यातल्या झाडांना पाणी घालणे आणि पळसाच्या पानांच्या पत्रावळी तयार करून त्या विकणे, हाच आयुष्यक्रम मी पाहिला. काही वर्षे त्यांनी एक स्टेशनरी दुकानही चालवलेले होते.
त्यांचा सारा व्यवहार ओटीवरच्या एका स्वतंत्र खोलीत चालायचा. आंघोळ, जेवणासाठी हाक मारली म्हणजेच फक्त घरात यायचे, देवपूजा करायचे आणि हातावर पाणी पडले की, स्वारी खोलीत जाऊन बसायची. कुटुंबाच्या किंवा गावकीच्या कोणत्याही भानगडीत ते पडत नसत. नेहमी आपल्याच कामाच्या तंद्रीत मग्न. कोणी काही बोलायला, सांगायला आला तरी त्याने बोलबोल बोलावे आणि ह्यांनी मात्र नुसते हू हू करावे, असा मामला. तात्यांना स्वच्छतेचे अतोनात वेड. घरात किंवा घराबाहेर केरकचरा साठलेला त्यांना आवडायचा नाही. सकाळचे शौचमुखमार्जन उरकताच म्हातारा हातात खराटा घेऊन झाडीत सुटायचा. त्यावेळी हद्दीचा प्रश्न हद्दपार असायचा. आमच्या घराबाहेरचा कचरा साफ होत असताना त्यांचा खराटा आसपासच्या घराभवतीही चक्कर मारायचा. ते भक्तिमार्गी होते. तरी त्या विषयावर चर्चाचिकित्सा कधी कोणाशी करीत नसत. आपण बरे नि आपले व्यवधान बरे.
माझे वडील आणि चुलते विनायकराव अशा दोन पुत्रांचा जन्म होताच त्यांनी आपल्या पत्नीच्या पायांवर एक दिवस अचानक डोके ठेवले आणि "वंशाला दोन फळे आली. आता आपण आमच्या मातोश्री" असे सांगितले, तेव्हापासून तो मरेतोवर तात्या आणि बय (माझी आजी) यांचे संबंध शेजाऱ्यासारखे राहिले. `एखादी मुलगी तरी व्हायची होती`, असे बयला वाटायचे. वडील नि चुलतेसुद्धा `भाऊबिजेसाठी आम्हाला बहीण नाही` म्हणून कुरबुरायचे. तेवढ्यासाठी आजीने गावातले वकील रावजी महादेव गुप्ते यांची एक मुलगी घरी आणून वाढवली, तीच आमची आत्या.
एकदा पनवेल गावात एक संत (दशोपासक) आले होते. पुष्कळांनी त्यांचा गुरुपदेश घेतला. तात्या त्यांच्या प्रवचनांना जायचे. पण त्यांनी गुरू घेतला नाही. का घेत नाही म्हणून मी विचारता ते म्हणाले, "छट, असले अडक्याचे तीन गुरू कोण करतो? माझा गुरू मला लहानपणीच मंत्र देऊन गेला, त्याचे महात्म्य फार थोर." "तुमच्या गुरूचे नाव काय?" बराच विचार केल्यावर, माझा आग्रह बळावलेला पाहिल्यावर, ते हलक्या पण गंभीर आवाजात म्हणाले, "माझ्या गुरुची परंपरा फार निराळी आहे. आजवर त्यांचे नाव मी कधी कुणाला सांगितले नव्हते. पण आज सांगतो. मला ज्यांनी जीवनाचा मार्ग दाखवला, त्यांचे नाव, राजराजेश्वर महाराज."
या संतपरंपरेचा मी आजवर पुष्कळ शोध केला पण व्यर्थ. मलाराजे पुष्कळ भेटले आणि त्यांच्या नादाला लागून मी आपले वाटोळेही करून घेतले. पण हे राजराजेश्वर स्वप्नातही कधी भेटले नाहीत.
सार्वजनिक नवरात्रोत्सव
आमच्या घरचे नवरात्र हे सार्वजनिक असायचे. माझ्या जन्मापूर्वी ते कधीपासून चालू झाले, हे माहीत नाही. नवरात्राचे नऊ दिवस तात्या उपोषण करीत. रोज दोन वेळा आणि अष्टमीला तीन वेळा महापूजा व्हायची. रात्री आरतीचा मोठा थाट. दिवेलागणीलाच अंगणात वाजंत्री वाजायची. आरती पुरी होऊन प्रसाद वाटणी अकरा वाजता पुरी व्हायची. पनवेलच्या बापट वाड्याचे मालक गोविंदराव बापट सहकुटुंब येऊन दाखल झाल्याशिवाय आजोबा आरतीला उभे रहायचे नाहीत. बापटांना उशीर झाला की आरतीलाही उशीर व्हायचा. आरती चालू झाली म्हणजे आजोबांचे अंग भरायचे आणि संचार व्हायचा. हे फक्त त्यांच्या बदललेल्या चेहऱ्यावरूनच काय ते समजायचे. नंतर भक्तजनांनी दर्शने घ्यायची, त्यांना प्रसाद वाटायचा. कोणाची काही गाऱ्हाणी असतील ती ऐकली जायची. त्यांना अंगारा मिळायचा.
बापटांची देवीभक्ती
या बापटांचे घराणे सात पिढ्या दत्तविधानावर चालू होते. खुद्द गोविंदरावही दत्तकच. त्यांनी जगदंबेची सेवा आरंभली. एका वर्षी प्रसन्न होऊन आदेश दिला, "जा. पुढल्या वर्षी पुत्राला घेऊन वाजत गाजत ये." त्याप्रमाणे गोविंदरावांना मुलगा झाला. तो वाजत गाजत अष्टमीच्या महोत्सवाला आमच्या घरी आणला आणि देवीच्या पायावर घातला. तोच मुलगा पुढे बाबासाहेब बापट म्हणून पनवेलीस सर्वांना माहीत आहे. आता हा बापटांचा वंश सुरळीत औरस चालू आहे. या एका घटनेमुळे, गोविंदराव बापट तात्यांचे अगदी निस्सीम भक्त बनले. जरा कुठे काही घरात खुट्ट झाले. कोणी आजारी पडला, व्यवहारात काही भानगड निघाली, की वृद्ध गोविंदराव आलेच आमच्या घरी धावत, तात्यांच्या कानांवर ते प्रकरण घालायला. तात्यांनी `घाबरू नकोस` म्हटले की त्यांना मोठा धीर यायचा आणि अखेर तात्यांची वाणीच खरी ठरायची.
प्लेगदेवीचे बंड
कोणत्याही रोगाच्या साथीशी देव किंवा देवीच्या कोपाचा धागा जोडून, रोगाच्या निपटणीपेक्षा त्या देव-देवीच्या स्तोमाचे प्रचंड बंड माजविण्याकडेच लोकांचा कल मोठा. देवीची लस टोचून घेण्यापेक्षा, ती साथ गावभर फैलावली की देवीचा माण्ड, त्रिक्राळ आरत्या आणि हिंदोळयावरची ढोलकीची गाणी घरोघर तडाखेबंद चालू व्हायची. पण प्लेगचा अवतार होताच. बरेच दिवस तो कोणत्या देव-देवीचा क्षोभ, याचा वडीलधाऱ्यांना थांगच लागेना. प्लेगचा पहिला हल्ला उंदरांवर होतो आणि उंदरांपाठोपाठ माणसांच्या जांघाडयात गाठ येऊन ताप भरतो आणि तो तडकाफडकी मरतो. या घटनेवरून मगजबाजांनी कयास केला की उंदीर हे श्रीगजाननाचे वाहन. आजपर्यंत कोणत्याही रोगाच्या साथीने त्या पवित्र वाहनाकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. मग आजच हा विलक्षण प्रकार का? याचे कारण अगदी स्पष्ट आणि उघड आहे. गणपती म्हणजे कडकडीत दैवत!
आजवर तुम्ही आम्ही त्या देवताची पूजा घरोघर करीत होतो. पण पुण्याच्या त्या टिळकाने ते दैवत चव्हाट्यावर आणून ठेवले. त्याची पदे काय केली. ते मेळे काय काढले, त्या भ्रष्टाकाराचा दैवताला कोप आला नि म्हणून हा `प्लेग बोकाळला`, असा संशोधनी निर्णय वृद्ध डोक्यातून बाहेर पडला. कित्येकांना तो मानवला तर कित्येकांना नाही.
विचारांच्या या वावटळीत अचानक भुमका उठली की एक प्लेगदेवी अवतरली आहे. ती गावोगाव शेंदूर माखलेल्या रेड्यावर बसून फिरत असते. गावोगावचे लोक तिला खंडणी देतात आणि त्या गावचा प्लेग चुटकीसरसा बंद पडतो. प्लेगदेवी हे काय लचांड किंवा थोतांड आहे, याची चौकशी ठिकठिकाणचे पोलीसही करीनात. हिंदूंच्या धर्मात सरकारने कशाला हात घालावा? त्या भटक्या देवीला हिंदूप्रमाणेच मुसलमानादी लोकही देणग्या द्यायचे, तेव्हा पोलीस तरी कशाला पडणार त्या भानगडीत?
प्लेगदेवीच्या दौऱ्याची ही बातमी मी तात्यांना वाचून दाखविली. "अरे सारे ढोंग आहे ते लुच्च्या लफंग्यांना लोकांच्या पैशाची लूट करण्याचा हा एक धंदा सापडलाय, दुसरे काय? पनवेलला कधी येणार आहे ती प्लेगदेवी? आल्यावर पाहू तिचा तमाशा." तात्या उद्गारले.
पनवेलीला प्लेगचा धुमाकूळ चालू झाला. (सन १८९६ साल असावे) सामान्यतः लहानसे तालुक्याचे ठिकाण पण दररोज चाळीसपन्नास केसीस होऊ लागल्या. अशा वेळी आला बुवा त्या प्लेगदेवीचा फेरा गावात! सकाळची वेळ. पिवळे पातळ, कपाळाला मळवट, केस अस्ताव्यस्त मोकळे, तोंड तंबाखूपानपट्टीने रंगलेले, डोळ्यांत भरगच्च काजळ फासलेले. हातात कामटीची एक धनुकली, रेड्यावर ठाण मांडलेले, आजूबाजूला पाच-पन्नास खेडुती नि महार मंडळींची गर्दी, महारी कर्कश वाजंत्री वाजताहेत आणि भोवतालचे लोक बोला बोला पिल्योग देवीचा एऽऽळकोट गर्जना करीत आहेत आणि खुद्द देवी मधूनमधून जबरदस्त आरोळ्या देऊन "खण्डणी भरा, नायतर करीन समद्या गावाची होळी." अशा जोरदार धमक्याही देत होती.
सारा पनवेल गाव हबकून निघाला. पांढरपेशे नुसती मजा पहात होते. काही दिडकी दमडी भगतांच्या थाळ्यांत टाकीत होते. आसुरी थाटाची ती कलकलाटी मिरवणूक पहायला बघ्यांची गोचीडगर्दी मिरवणुकीबरोबर जमत गेली. होता होता प्लेगदेवीचा फेरा सरकारवाड्यावरून प्रभूआळीकडे वळला. तेथून ती महारवाड्यात विसर्जनाला जाणार होती. विरुपाक्षाच्या देवळाजवळ तो घोळका येताच, कोणीतरी येऊन तात्यांना म्हटले. "तात्या. पाहिलीत का प्लेगदेवी? भयंकर प्रकरण दिसते." नेहमीप्रमाणे तात्या हातात खराटा घेऊन अंगण झाडीत होते. "त्या रांडेला इकडे समोर घेऊन या तर खरे, पाहू खरेखोटे काय आहे ते." तात्या म्हणाले. चारपाच मंडळींनी म्होरक्यांना सांगून रेडेस्वार बाईची मिरवणूक देवळेमागील आमच्या अंगणात आणली.
तात्यांपासून पन्नास-साठ फुटांवर मिरवणूक थांबली. बाईच्या गर्जना नि महारी वाजंत्र्यांचा घणघणाट जोरजोराने होऊ लागला. "भिकोबा धोडपकरांशी आता गाठ आहे. दाखव म्हणावं बाईला काय तुझं सामर्थ्य आहे ते." असे कोणीतरी मोठ्याने बोलला. अंगात भयंकर अवसान आल्यासारखे करून ती बाई ओरडली. "अरे कोण आहे तुमचा तो भिकोबा दाखवा मला. आत्ता त्याची गठडी वळते. (दूर पाहून) कोण? तो थेरडा? तो काय माझं करणार?" तात्यांच्या कानांवर ते शब्द जाताच, त्यांनी "च्याऽऽप" अशी आरोळी ठोकली आणि हातातला खराटा थडाड़ जमिनीवर आपटला. ताडकन ती प्लेगदेवी त्या रेड्यावरून खाली घसरून पडली आणि "मेले, मेले" ओरडत गडबडा लोळू लागली.
वाजंत्री बंद पडली. लोकही घाबरले. भगतगणांची तारांबळ उडाली. जो तो तिला "काय झाले, काय झाले" विचारीत सावरायला लागला. बाई रस्त्यावर डोके आपटू लागली. "मेले, मेले" सारखी किंचाळून ओरडत होती. मग हो काय? शेकडो लोक तेथे जमा झाले. जसे काही कोठे झालेच नाही. आपण त्या गावचेच नसल्यासारखा तात्यांचा झाडू खुशाल चालला होता. ती देवीबाई तर पोट आवळून हंबरडा फोडीत आणि धुळीत गडबडा लोळत लोळत तात्या झाडीत होते तेथे येऊ लागली. "पाया पडते बाबा, मला माफ कर. आता नाही हा पोटाचा मुरडा सोसवत." हात जोडून ती विनवण्या करू लागली. "अग तू देवी आहेस ना? मग कशाला बोंबलतेस एवढी. माझी गठडी वळवतेस ना? वळव, "तात्या मिस्किलपणाने म्हणाले. बाईने आपले थोबाड बडवायला सुरवात केली. तात्या हुकमी आवाजात म्हणाले, "हे सोंग-ढोंग बंद करशील का नाही, सांग? आत्ताच्या आत्ता गाव सोडून गेले पाहिजे तुला. नाहीतर दाखवीन आणखी इंगा." "जाते जाते, बाबा आत्ता जाते. पण हा पोटातला मुरडा थांबव, पाया पडते तुझ्या." ती ओरडू लागली. "खा तर मग मूठभर धूळ नि जा हो चालती." तिने बचकभर धूळ तोंडात घातली नि काही वेळ निपचित पडली. बघ्या लोकांनी मग एकच काहूर केले. आणि त्या मिरवणूकवाल्यांची ससेहोलपट काढली. कोणी वाजंत्र्याच्या ढोलक्या फोडल्या, तर काही सराईतपुंडांनी जमलेल्या पैशाच्या थाळ्या पळविल्या. अशी एकच हुर्रेवडी झाली.
एक भयंकर प्रसंग
प्लेगच्या साथीत लोकांच्या हितासाठी (?) सरकारने घातलेला धुडगूस आठवला की अजूनही अंगावर काटा उभा रहातो. पुण्याला रॅण्ड नि आयर्स्टचे खून पडल्यामुळे त्या घटनेचा थोडासा इतिहास केवळ ऐकीव म्हणून काही लोकांना माहीत असेल. ज्या घरात अगर झोपड्यात प्लेगची केस व्हायची, ते घर अथवा झोपडपट्टी, जे काय असेल ते, आतल्या सामानासह जाळून खाक करायचे, हा सरकारचा प्लेगवरचा रामबाण उपाय! गावोगाव हेच चालले होते. पनवेल गाव प्लेगच्या तडाक्यात सापडले. (सन १८९६-९७ ची हकिकत) बापटांचा वाडा म्हणजे जुऱ्या काळचा पेशवाई थाटघाटाचा प्रशस्त. सभोवार अनेक चाळींचा गराडा पडलेला, (आजही पहायला मिळेल.) तेथे घाटोळी लोक रहात असत.
प्लेगच्या पाच-सहा केसी तेथे होताच, त्या वेळचा गोरा कलेक्टर ब्रुकसाहेब याने हुकूम सोडला की सगळ्या चाळींसगट बापटांचा वाडा जाळून टाकावा. बापटांचा वाडा म्हणजे अर्धे पनवेल गावच म्हणाना. आणि तो जाळून उध्वस्त करायचा? होय. सरकारके हुकूमसे डर्र! बिचारे गोविंदराव बापट घाबरून गेले. काय करावे, काही त्यांना सूचेना. ब्रुकचा कॅम्प त्यावेळी चौक गावाला होता. सकाळी घोड्यावर बसून बाराच्या सुमाराला तो स्वतः जाळपोळ पहायला येणार होता. इकडे भल्या सकाळीच प्लेग मामलेदार, पोलीस, म्युनिसिपालिटीचे महार नोकर, तो जुऱ्या थाटाचा आगीचा बंब आणि शेदीडशे घासलेट तेलाचे डबे वाड्याच्या मध्यभागी जय्यत तयार. साऱ्या गावच्या तोंडचे पाणी पळाले. काय होते काय नाही.
रडून रडून बापट कुटुंबाचे डोळे सुजले. तशाच अवस्थेत गोविंदराव, अखेरचा तरणोपाय म्हणून धावत धावत आमच्या घरी आले. तात्या नेहमीप्रमाणे खराटा घेऊन बसल्या बसल्या अंगणाची साफसफाई करीत होते. तात्या नजरेला पडताच, गोविंदराव मोठयाने ओक्साबोक्सी हंबरडा फोसू लागले, "काय रे गोविंदराव, रडतोस का? काय झाले?" तात्यांनी विचारले. "जगदंबे, घात झाला. ब्रुकसाहेब माझा वाडा जाळीत आहे." असा आक्रोश करून, गोविंदरावांनी तात्यांच्या पायांना मिठी मारली. अंगात संचार झाल्यासारखे तात्यांनी हातातला खराटा थडाड जमिनीवर आपटला नि ओरडले, "पाहू बरं, कसा तो हरामखोर तुझ्या वाड्याला हात लावतो ते. हातपाय तोडून टाकीन. जा खुशाल घरी स्वस्थ बैस. वाड्याला आग लावतो काय साला चोर?"
अकरा वाजले, बारा वाजले, सारे आगवाले हापीसर साहेबांची वाट पाहताहेत. साहेबाचा पत्ता नाही. साहेब चौकहून पनवेलला येणार इतका वेळ लागायचा नाही. दीड झाला. दोनचे ठोके पडले. आणि आणि खेडुती लाकडी पाळण्याच्या डोलीत घातलेल्या जखमी ब्रुकसाहेबांची स्वारी मामलेदार कचेरीत पाच-सहा कातकऱ्यांनी आणली. सगळे लोक तिकडे धावले. त्यांना पहाताच साहेब कण्हत कुंथत ओरडू लागले, "बम्मनका वाडा मत जलाव बम्मनका वाडा मत जलाव."
झाले काय? पेण चौकाकडे जाताना पनवेलच्या सरहद्दीवर गाढीनदीचा पूल आहे. मध्यंतरी तो कोसळला आणि मिलिटरीने तेथे पूल बांधून रहदारीची हंगामी व्यवस्था केली होती. यावेळी तो दगडाचा होता. पण ब्रुकाच्या वेळेला लाकडी होता. साहेब बहादूर घोड्यावरून येत असताना एक बैलगाडी आडवी आली. त्यांचा घोडा अचानक बुजला आणि लाकडी कठड्यावरून स्वारासकट खाली नदीच्या खडकाळ पात्रात कोसळला. घोडा ठार झाला नि साहेब मात्र सर्वांग जखमी होऊन मदतीसाठी बोंबलू लागले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना डोलीत घातले आणि त्यांचे पार्सल सरकारवाड्यात आणून डिलिव्हर केले. तात्यांना ही बातमी कळल्यावर ते म्हणाले, "जगदंबेचा शब्द खोटा ठरेल काय? जा म्हणावं आता मुंबईच्या इस्पितळात कर्माची फळे भोगायला. पाच-सहा हजार लोकांना राखेच्या पुंजीवर बसवीत होता, नाही का तो गोरा?"
नवरात्राची अष्टमी
या दिवशी रात्रीच्या आरतीच्या वेळी नवस फेडायला आणि दर्शन घ्यायला दूरदूरचे लोक यायचे. कणा रांगोळी. फुलवरा आरतीचा थाट झगझगाटी असायचा. देवस्थानाची खोली अगदीच लहान. साधारण दहा-पंधरा माणसे जेमतेम बसायची आणि ओटीवर अंगणात आणि पलीकडे विरुपाक्षाच्या मंडपात भक्तांची गर्दी चिक्कार! त्या दिवशी दरवाजावर वडील आणि चुलते उभे रहायचे. आतली गर्दी सामोपचाराने बाहेर काढायची आणि बाहेरच्यांना थोडेथोडे आत पाठवायचे, हे काम जिकिरीचे असे, शिवाय सारा व्यवहार रात्री बाराच्या आत आटोपलाच पाहिजे.
देवीपुढे वाहिल्या जाणाऱ्या फळफळावळीने आणि मिठाईने सारे घर भरून जायचे. प्रसाद म्हणून कितीही वाटावाट केली तरी राशीच्या राशी उरत. कापडचोपड, खणलुगडी आणि नारळ यांची दसऱ्यानंतर नित्य संबंधाच्या खेडुतांत वाटणी चालायची.
या रात्री आजोबा आरती संपेपर्यंत संचारलेले असत. अगदी दूरवरुन आलेल्या अनोळखी माणसांना गूढातल्या गूढ खाणाखुणा पटवून देत असत. भाषण अगदी शांत असे. सारे तेज फक्त डोळ्यांत चमकायचे. कित्येक वेळा तर एकाएकी सांगायचे, "अरे, विरुपाक्षाच्या मंडपात तो अमुक तमुक माणूस बसला आहे. त्याला आधी घेऊन या इथं. तो दर्शनासाठी उपोषण करीत आहे." चार-पाचशे लोकांच्या गर्दीतून तो माणूस काढायचा तरी कसा हुडकून? चटकन ते त्याचा वेष पेहराव कसा आहे त्याचा तपशील सांगायचे आणि मग लोकांनी त्याला देवीच्या समोर आणून बसवायचे.
कर्नाटकी शाक्ताची भेट
असाच एकदा कर्नाटकी शाक्त मुद्दाम देवीच्या दर्शनाला आला होता. ही माझ्या आठवणीतील गोष्ट आहे. पनवेल येथे भिकोबा धोडपकर नावाचे कोणी तेखदार (पॉवरफुल) शाक्त आहेत, हे त्याला समजल्यावरून तो त्यांची परीक्षा पहाण्यासाठी मुद्दाम आला होता. प्रथम तो मुंबईला आला नि चौकशी करू लागला. "बीकूबा द्वाडपकर.. पानवेल राहतो. मोठ्ठा शाक्त बोलतो...." वगैरे चौकशी करू लागला. ठाकुरद्वारी त्याला एक पाठारे प्रभूचे जोडपे भेटले. ते अष्टमीसाठी पनवेललाच जाणार होते. त्यांनी त्या पत्ता दिला. त्यावेळी मुंबईहून पनवेलीस जाण्याचा एकच बोटीचा मार्ग. भाऊच्या धक्क्यावरून हाजी कासम कंपनीची बोट सुटायची. ती उरण, न्हावेशेये आणि आणि उलवा ही तीनच बंदरे घ्यायची. उलव्यास घोड्याचे टांगे मिळत. माणसी चार आणे देऊन थेट पनवेल गावात बिऱ्हाडाच्या जागी येऊन दाखल होता येत असे.
तो कर्नाटकी आला तो प्रथम विरुपाक्षाच्या सभामंडपात ठाण देऊन बसला. अंगावर एक उपरणे आणि नेसूची लुंगी, एवढेच त्याचे लगेज. कोणाला काही त्याने विचारले नाही, काही बोलला नाही. विहिरीवर त्याने स्नान केले आणि ओलेच कपडे अंगावर वाळवले. आम्ही हे सर्व पहात होतो. कोण कुठले म्हणून विचारल्यास नुसता हसायचा. उत्तर नाही.
दिवेलागणी झाली. वाजंत्री वाजू लागली. आठच्या सुमाराला गोविंदराव सहकुटुंब आले. लोकांची दाटी वाढली. आरती झाली. गाऱ्हाणी नवसांची गर्दी उडाली. सुमारे दहाच्या सुमाराला आजोबांनी "जा रे कोणी देवळात आणि त्या कानडी अप्पाला घेऊन या इथं" असा हुकूम फर्माविला. तो आला. वटारलेल्या डोळ्यांनी सर्व थाट पाहू लागला. बस खाली म्हणून आजोबांनी हाताने खूण केली. रात्री बारा वाजता सर्वांची दर्शने, अंगारे देणे, प्रसाद वगैरे आटोपेपर्यंत कर्नाटक्याला तसाच एका बाजूला बसवून ठेवला. रात्री साडेअकरा वाजता त्याला "समोर ये" असे संचारलेल्या आजोबांनी खुणावले, समोर येताच त्या कर्नाटक्याने खाडखाड काही विचित्र भाषेत बडबडायला सुरवात केली.
त्याला त्याच भाषेत भराभर जबाब मिळत गेले. इतक्यात आरतीच्या तबकातील निरांजने, तूप संपल्यामुळे विझण्यासाठी तडतडू लागली होती. तिकडे त्या कर्नाटक्याने अवसानात बोट दाखवले. त्या गूढ आशय ताडून आजोबांनी जवळच पाण्याने भरलेले रामपात्र होते त्यातले पाणी निरांजनात ओतले. ती प्रज्वलीत जळू लागली. हे पाहताच त्या कर्नाटक्याने एकदम पाय धरले आणि साष्टांग नमस्कार घातला. आजोबांनी त्याला जवळ घेऊन पाठीवर हात फिरवला आणि त्याच्याच भाषेत काही सांगितले.
नंतर आमचा महानैवेद्य, परात भरून आला. या नैवेद्यात मटनाचे विविध प्रकार आणि अर्क (दारू) असायची. देवीचा महाप्रसाद तोच, सवाष्णपूजन झाल्यावर आजोबांनी त्या कर्नाटक्याच्या हातावर थोडे मटन टाकले आणि अर्काचा प्याला पुढे धरला. तो टंगळमंगळ करतो असे दिसताच, त्यांनी एक भयंकर आरोळी मारली. कर्नाटकी घाबरून पाहतो तो त्याच्या तळहातावर गुलाबाची चार फुले आणि वाटीत दूध दिसले. त्याने पुन्हा नमस्कार घातला आणि दुधाबरोबर ती फुलेही खाल्ली. "कच्चा आहेस बेटा अजून तू जा." असे सांगून आजोबांनी त्याला निरोप दिला.
आपणच असे का हो तात्या?
एक दिवस मी तात्यांना स्पष्ट विचारले, "तात्या नुसत्या अंगाऱ्याच्या चिमटीने तुम्ही अनेक रंकांना रावपदाला पोहचविलेत. दरिद्रयाचे श्रीमंत केलेत. लोकांना चमत्कारही दाखवलेत, पण तुमच्या अंगाखांद्यावरच्या वाकळी काही चुकल्या नाहीत. कितीक वरसं पहात आहे, तेच जुने पागोटे नि तेच कप्प्याचे उपरणे. आम्हा पोरांनाही धड कपडा नाही. हे असे का? ही तुमची जगदंबा काय दुसऱ्यासाठी आमच्या घरात ठाण मांडून पूजा खात बसली आहे की काय? इतरांच्या नवसाला पावते आणि आमची सकाळ गेली, संध्याकाळची बोंबाबोंब. हा काय प्रकार आहे? सांगा." तात्या बरेच गंभीर झाले. ते म्हणाले, "दादा, तुझं म्हणणं बरोबर आहे. आज देवीच्या नावावर मी जे कुणाला काही दिलं नि देत आहे. ते सारे तुमच्या भविष्यासाठी, माझ्यासाठी काही नाही." त्या उज्वल वैभवी भविष्याचा गोड स्वाद आज मी सहकुटुंब सहपरिवार घेत आहे.
नंतर दुसरा सवाल टाकला, "हे आपल्या घरचे सार्वजनिक नवरात्र हयातभर तुम्ही चालवले. पण तुमच्यामागे आम्हाला कसा काय असला थाट चालवता येणार?"
तात्या म्हणाले, "याचा बंदोबस्त केल्याशिवाय मी जाणार नाही. हा पंथ तुम्हाला चोखाळता येणार नाही. तुमचा पंथ अगदी ऱ्यारा आहे. एक मात्र करा. माझ्यामागे हे झोपडे या जागेवर शिल्लक ठेवू नका आणि तुम्ही पनवेल कायमची सोडा. माझ्या त्यागाची पुण्याई खास रहाणार आहे तुमच्या पाठीशी."
मरणापूर्वी एक वर्ष नवरात्रासाठी आलेल्या सगळ्या भक्तांना तात्यांनी बजावले, "हे पहा, पुढल्यावर्षी येथे काही नाही. हाच अखेरचा उत्सव आणि अंगारा ही प्रथा येथेच थांबली असे समजा." त्या नवरात्रीची ती अष्टमीची रात्र सगळ्या भक्तांनी डोळ्यांतले आसवांचे पाट सावरीतच साजरी केली.
आजोबांची काशीयात्रा
एकोणिसाव्या शतकाचे शेवटचे दशक जुऱ्या पिढीतल्या धर्मनिष्ट मंडळींना काशीयात्रा म्हणजे जीवनाचे साफल्य वाटायचे. ती यात्रा करणे हेसुद्धा त्या काळात मोठे दिव्य असे. काशीला जाणारा असामी सुखरूप परत आला म्हणजे मिळविली. बहुतेक त्याची तिकडेच कोठेतरी गच्छंती व्हायची, हाच सगळ्यांचा समज. काशीयात्रेला दिव्य म्हणायचे याचसाठी.
बरं, ती यात्रा म्हणजे भरपूर पैशांचा खेळ. पैसेवाल्यांनीच त्या फंदात पडावे. आमच्या घरी धनाचा खडखडाट, गेला दिवस तो साजरा, अशी परिस्थिती. सन १८९४-९५ साल असावे. अचानक एके दिवशी पनवेल गावात भुस्कुटे नावाचे एक प्रयागचे गयावळ येऊन दाखल झाले. माणूस चांगला गोरामुरका दणकट बांध्याचा, जामानिमा ठाकठीक. हिंदुस्थानी मिठ्ठास बोलणारा, भेटेल त्यावर झपकन छाप बसवणारा. वडाळा तळयाच्या धर्मशाळेत त्याने आपले बस्तान ठेवले. बरोबर एक नोकरही होता. काशीयात्रेला यात्रेकरू जमवून नेण्याचा त्याचा धंदा. येताच त्याने गावातील प्रतिष्ठित लोकांच्या गाठीभेटी घेण्याचे सत्र चालू केले. बहुतेक ठिकाणी "तुम्ही भिकोबा धोडपकरांना उठवीत असाल तर आम्ही विचार करू." असे त्याला सांगण्यात आले.
शोध करीत करीत भुस्कुटे आमच्या चंद्रमौळी घराकडे वळले. गावातला प्रत्येक असामी भिकोबा धोडपकरांकडे बोट दाखवीत आहे, तर हे गृहस्थ कोणीतरी श्रेष्ठी असावी, अशी त्या समजूत पहातो तो काय? पंचा नेसलेले एक जराग्रस्त गृहस्थ हातात खराटा घेऊन अंगणाची झाडलोट करीत असलेले दिसले. त्याने सतमुखाने आणि कंबर वाकवून तात्यांना नमस्कार केला. आज हा कोण भरगच्च जामानिमा केलेला पाहुणा आला, म्हणून तात्याही विचारात पडले, "या बसा ओटीवर, मी आलो" म्हणून तात्या हातपाय धुवायला विहिरीवर गेले. मला हाक मारून म्हणाले, "दादा, कोण रे हे? चौकशी कर". भुस्कुट्यांना मी विचारले. "काशी प्रयागहून मी आलो आहे तुमच्या आजोबांना काशीयात्रेला नेण्यासाठी", असे त्यांनी म्हटले. तात्यांना ते मी सांगताच, "काशीयात्रेला? आपली थट्टा करण्यासाठी तर कोणी नाही ना पाठवले याला आपल्याकडे?" तात्या उद्गारले.
तात्यांनीही खोलीत जाऊन अंगरखा पागोटे चढवले आणि ओटीवर येऊन दोघांचे नमस्कार झाले.
भुस्कुटे : प्रयागच्या काळभैरवाने पाठवले आहे मला आपल्याकडे. काशीविश्वेवराच्या दर्शनाला आपण आले पाहिजे.
तात्या : (खेदमिश्रित किंचित हसून) दोघांनी माझी थट्टा करून अब्रू घ्यायचे ठरवले आहे की काय? अहो, मी जन्माचा दरिद्री वीष खायला जवळ दिडकी नाही नि काशीयात्रेचे नावच कशाला घेता?
काशीयात्रा
गयावळ लोक बोलण्यात इतके मिठ्ठास असतात की हा हा म्हणता समोरच्याला भजनी लावतात. "आपण उठल्याशिवाय गावकरी उठत नाहीत. पनवेलची यात्रा मिळाली नाही तर कालभैरवाला नि काशीविश्वेश्वराला मी काळे तोंड कसे दाखवू महाराज" भुस्कुटे बोलले. अवघ्या अर्ध्या तासाच्या आत त्यानी तात्यांना काशीचे वेध लावले. "बरे आहे. विचार करतो. असे आश्वासन घेऊन भुस्कुटे गेले. झाले, तात्याची चर्या बदलली. जवळ तर काहीच कसली माया नाही नि विश्वेश्वर बोलावतोय! चारपाच दिवस ते सारखे विचारमग्न होते. जेवणखाणही त्याना सुचेनासे झाले. "अहो तात्या, एक गयावळ येतो काय नि तुम्हाला काशीयात्रेचे वेड लावतो काय. अंगण पाहून हातपाय पसरावे. सहज मुंबईला जायचे तर आपल्याला कोणापाशी तरी रुपया उसना मागावा लागतो. आणि ही यात्रा म्हणजे काय? हजारपाचशे रुपयाचा चुराडा. सांगा त्या भस्कुट्यांना की, "आमचा सारा प्रवासखर्च तू करीत असलास तर येतो. नाहीतर जा गावातल्या श्रीमंतांकडे." असे परोपरीने वडलांनी, आईने नि आजीने त्यांना सांगून पाहिले. पण व्यर्थ!
तात्या धोडपकर निघणार, या थापेवर त्या गयावळाने पनवेलीतले वीस-पंचवीस लोक उठवले, तेही आमच्याडे येऊन "काय तात्या, केव्हा निघायचे?" विचारू लागले. तात्यांची मनःस्थिती विचित्र झाली. त्यांनी बोलणेही बंद केले. कोणी काही विचारले तर नुसते हू हू करायचे.
नेहमीच्या पद्धतीप्रमाणे संध्याकाळी देवदर्शनासाठी गावप्रदक्षणेला गेले असता, बापटांच्या राममंदिरातल्या पायऱ्यांवर विचारमग्न अवस्थेत बसूनच राहिले. एरवी, दर्शन घ्यायचे, क्षणभर पायरीला स्पर्श करायचा नि चालते व्हायचे, असा त्याचा खाक्या. पण आज पायरीवर बसून राहिले. इतक्यात दाण्डेकर नावाचे त्याचे समवयी वृद्ध स्नेही रामदर्शनाला आले. तात्या पायरीवर बसून राहिले. इतक्यात दाण्डेकर नावाचे त्याचे समवयी वृद्ध स्नेही रामदर्शनाला आले. तात्या पायरीवर बसूनच राहिल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यानी जवळ बसून मुद्दाम चौकशी केली. बराच आग्रह केल्यानंतर तात्या म्हणाले, "काशीविश्वेश्वराने बोलावले आहे नि आमची स्थिती तर जगजाहीर आहे. काय करायचे सांगा."
इतके ऐकताच, "जरा इथंच बसून रहा. मी आलो." असे म्हणून दाण्डेकर उठले नि घरी गेले. पाचदहा मिनिटांतच ते परत आले एका रेशमी रुमालात गुंडाळलेली रुपयाची थैली तात्यांच्या हातात दिली. "तात्या हे घ्या माझे शंभर रुपये", असे म्हणत त्यांनी तात्यांच्या पायांवर मस्तक ठेवले. संध्याकाळी देवदर्शन घेण्याची पद्धत त्यावेळी वडीलधाऱ्या मंडळींत विशेष असे. सारे समवयस्क तेथेच रोज एकत्र जमायचे. हे दोघे तेथे बसले असताना श्रीमंत गोविंदराव बापट आले, वैशंपायन वकील आले, अंतोबा पटवर्धन आले. लागली रीघ मोठमोठ्यांची. दाण्डेकरांनी वस्तुस्थिती प्रत्येकाला सांगताच, जो तो "थांबा इथंच, आलोच आत्ता मी" असे म्हणून तातडीने घरोघरी गेला आणि कोणी शंभर, कोणी पन्नास, अशा रकमा घेऊन धावतच आला, नि तात्यांच्या उपरण्यात घालू लागला. राममंदिरातला हा प्रकार हा हा म्हणता गावभर झाला आणि जो उठला तो आपली फूल ना फुलाची पाकळी घेऊन धावला.
दिवेलागणी होऊन बराच वेळ झाला तरी तात्या घरी परत का आले नाहीत, म्हणून आईने नि आजीने मला चौकशीला पाठविले. राममंदिरात अचानक चाललेली लोकांची वर्दळ पाहून मी तिकडेच वळलो. पहातो तो काय? तात्यांच्या उपरण्यात रुपयांच्या राशी पडत आहेत आणि ते आसवांनी डबडबलेले डोळे वरचेवर पुशीत स्वस्थ बसले आहेत. सुमारे साडेआठाच्या सुमाराला, बरोबर पाच-सहा मंडळी नि तात्या सद्गदित होऊन घरी आले. "काय हो, काय आहे भानगड?" असे आजीने विचारताच, त्यांनी ते रुपयाचे गाटोडे तिच्या हातात देऊन म्हटले, "चला करा तयारी काशीयात्रेची. विश्वेश्वराने पाठवून दिले रुपये आपल्यासाठी. "त्यानंतर पंधरा दिवसांतच वीस-पंचवीस गावकरी मंडळींच्या समवेत माझे आजोबा आणि आजी, गावकऱ्यांचा थाटामाटाचा निरोप घेत घेत यात्रेला निघून गेले.
काशीयात्रेतल्या काही हकिकती
आगगाडी आणि आगबोटीच्या प्रवासाखेरीज बाकी कोठेही आजोबा पायी चालत जायचे. जनावरे जोडलेल्या वाहनांतून प्रवास न करण्याचा त्यांचा संकल्प होता, मग तो पायी प्रवास कितीका जवळदूर असेना. ते खुशाल चालत जायचे. काशीयात्रेत त्यांनी हेच केले. रेल्वेमार्ग आहे नि सडकही आहे तर ते इतराना रेल्वेने पाठवून आपण सडकेने पायी जायचे. बरोबरची मंडळी प्रयागला आगगाडीने रवाना झाली आणि तात्या सडकेने चालले होते. मध्यरात्रीची वेळ. जिकडे तिकडे निहूप वाटेत चिटपाखरूही भेटेना. एका लांबलचक पुलावरून स्वारी चालली असता, अचानक एक इसम "बाबूजी, ठेहरो ठेहरो" अशा हाका मारीत त्यांच्या पाठीमागे जलदीने धावतच येतोसा दिसला. तात्या घाबरले. काळभैरवाचे मनोमन चिंतन करीत झपाझप पावले टाकीत चालू लागले. तो इसम हाका मारीत सारखा पाठलाग करीत आहे आणि तात्या मुठीत जीव घेऊन चालताहेत. इतक्यात समोरून एक काळाकभिन्न हत्यारबंद असामी हातातल्या सोट्याचे घुगुर खळखळ वाजवीत समोरून आला. त्याला पहाताच तो बाबूजीवाला मागच्या मागे पसार झाला. या घटनेची कथा सांगताना तात्या म्हणायचे, "अहो, प्रत्यक्ष काळभैरवच माझ्या धावण्याला धावला."
कनखल तीर्थात आजी बुडाली
कोणत्याही यात्रेत तीर्थस्नानाचा बडिवार मोठा. पनवेलकर यात्रेकरू कनखल तीर्थावर स्नानाला गेले. पंडे एकेकाला मंत्र सांगताहेत नि यात्रिक भक्तिभावाने तीर्थात तो सांगेल तेवढ्या बुचकळ्या मारताहेत. त्या तीर्थात सुसरी रगड चक्क आपापले जबडे वासून पाण्याच्या पृष्ठभागावर बेगुमान वावरत होत्या. आजी पाण्यात उतरून बुचकळी मारणार तोच तिचा पाय निसटला नि डोळ्याचे पाते लवते न लवते तोच ती पाण्यात दिसेनाशी झाली. सगळे घाबरले. काय करावे कोणालाच सुचेना. पंड्यांना विचारले तर ते म्हणाले, "बाई मोठी पुण्यवान, गेली मोक्षाला आता कसली सापडते महाराज, या जबरदस्त सुसरीच्या तडाक्यातून आजवर कोण वाचला आहे?"
तीर्थाचे पुण्य राहिले बाजूला आणि ह्या अनपेक्षित अपघाताचे पाप लागले हात धुऊन सगळ्यांच्या पाठी. इतक्यात अचानक आजी दोन हात वर करून काठाजवळ आलेली पहाताच एका पंड्याने धीर करून हात घरले नि तिला ओढून बाहेर काढली. यात्रेहून परतल्यावर. "तू अशी आलीस कशी बाहेर?" असे मी विचारता, ती म्हणाली, "अरे, लग्नापूर्वी कराडला असताना मी कृष्णामाईच्या पात्रात मनसोक्त पोहत असे. लगीन झाल्यावर काय? सारेच बंद झाले. नद्या गेल्या नि विहिरींशी गाठ पडली. लहानपणची ती पोहण्याची शहामत नि करामत मला त्यावेळी उपयोगी पडली. अगदी तळाशी जाताच, एकदम मी वर उसळी मारली नि आले झाले बुडालेल्या जागी परत."
आजोबांनी पंड्यांची जिरवली
सगळी यात्रा झाल्यावर गयेला एका ठिकाणी अखेरचे महाश्राद्ध करावचे असते. ते केले म्हणजे बेचाळीस पूर्वजांचा उद्धार झाला असे मानण्यात येते. सारे यात्रेकरू स्त्रिया नि पुरुष रांगेने उघड्यावर तीर्थाच्या काठावर बसलेले. त्यांच्या प्रत्येकाच्या सारख्या जुळलेल्या हातांवर एक एक फुलांचा हार गुंडाळलेला. त्याला म्हणतात बेडी रत्नखचित मखमली जामानिमा केलेला गयावळांचा श्रेष्ठ महंत तेथे येतो. पाचूच्या लोलकाची टप्पोऱ्या मोत्यांची भिगबाळी त्याच्या कानात, गळ्यात कंठा, मस्तकावर जरतारी उंच टोपी, हातांत मौल्यवान रत्नखचित कांकणे, असा थाट, मुद्रा गयावळी समोर येऊन तो बसला. "काय महाराज, काय दक्षणा देणार आम्हाला?" प्रत्येकाला विचारू लागला.
त्याच्या बोलण्यात असा काही विलक्षण आर्जवीपणा नि काकुळती होती की जसा काही एखादा अठराविश्वे दारिद्रयाने खंगलेला असामी समोरच्या धनिकांजवळ प्राणत्राणार्थ याचना करीत आहे. "बोला बोला. महाराज, दक्षणेचा आकडा बोला" हे त्याचे पालुपद सारखे चालू होते. कोणी दोन रुपये, कोणी पाच रुपये म्हटले. का "छे छे असं कसं चालेल मायबापांनो तुमच्या उदारपणावर तर आम्ही जगणारे" वगैरे वाचाळपंचविशी सारखी सुरू. पाचचे आकडे वाढत वाढत शंभर पर्यंत गेले तरी त्याचे समाधान होईना. आजोबा "इथे लोळण घेतलीस तरी मी नि माझी बायको दोन रुपयांपेक्षा अधिक एक कवडीही देणार नाही." सूर्य मध्यान्हीला आलेला. सकाळपासून कटकट चाललेली. आजोबांनी ते शब्द उच्चारताच, त्याचा गयावळपणा एकदम गेला आणि त्याचा धर्ममार्तण्डपणा खवळून उफाळला." "मागतो तेवढी दक्षणा देत नसाल तर बेडी निघणार नाही, मंत्र म्हणणार नाही. जा तुमचे सारे पूर्वज नरकात जातील."
इतके म्हणताच तात्यांनी हातावरचा हार फेकून दिला नि उठून उभे राहिले. "गाढवा, आमचे पूर्वज नरकात जाणार काय? आता तुलाच दाखवतो नरकाची वाट. एक रुपयापेक्षा कवडीही वर देऊ नकारे कुणी या फाजील गयावळाला. आला लेकाचा मोठा स्वर्ग नरकाच्या धमक्या द्यायला. चला उठा सगळे खड्ड्यात गेले ते श्राद्ध "तात्यांचा तो रुद्रावतार पहाताच त्या महंताची बोबडीच वळली. तात्यांचे पाय धरून", बसा बसा महाराज, कवडीही देऊ नका. मी सगळ्यांचे धर्मकार्य मुकाट्याने करतो" अशा विनवण्या करू लागला, "अरे मूर्खा, आमच्या पूर्वजांच्या स्वर्ग-नरकाच्या किल्ल्या काय तुझ्या हातात आहेत काय? कोण लागून गेलास तू असा. यात्रेकरू देतील ते सुखासमाधानाने घ्यायचे. उलट धमक्या द्यायचा तुला काय अधिकार?"
जन्मात कधी कोणावर न रागावणारे तात्याच इतके भडकल्यावर, सारे यात्रेकरू हार तोडून उभे राहिले. इतर पंड्यानी मध्यस्थी केली. कसाबसा तो विधी अखेर उरकण्यात आला. या यात्रेकरूंचे बिन्हाड त्याच महंताच्या वाड्यात होते. तेथे गेल्यावर तात्यांनी पनवेलकरांना तात्काळ तेथून बिन्हाड हालवण्याचा हुकूम सोडला. "येथे पाणी पिणे म्हणजेच नरकात जाण्यासारखे आहे. चला, उचला आपले सामान. महंताची त्रेधातिरपीट उडाली. त्याने लोटांगणे घातली. माफी मागितली. तेव्हा महानैवैद्यापुरते तेथे रहाण्याचे तात्यांनी कबूल केले."
जाहीर सत्कार नि मावंदे
काशीचे यात्रेकरू कल्याण-कर्जत मार्गे पनवेलला येणार अशी पत्रे आली. कर्जतला बैलगाड्या रवाना झाल्या. मंडळी आली. सर्व गावकऱ्यांनी त्यांची गावाजवळच असलेल्या इस्त्रायली तळ्यावरील प्रशस्त धर्मशाळेत उतरण्याची सोय केली. भोजन तेथेच झाले. सायंकाळी ताशे वाजंत्री वाजवीत गंगेची घागर माझ्या वडिलांच्या हातात मागे यात्रेकरू आणि प्रतिष्ठित गावकरी नि जनसमाज अशी मिरवणूक निघाली. घरी पोहचताच वडिलांनी सर्वांना पानसुपारी अत्तरगुलाब दिले. मावंद्याचाही थाट होऊन सर्वत्रांना गंगाजल वाटण्यात आले. तात्यांचे अनेक भक्त सहकुटुंब त्यांच्या दर्शनाला पंधरा दिवस सारखे येतच होते.
एकवीरा देवीची यात्रा
तात्यांच्या अमदानीत दोन यात्रा अनुभवण्याचा योग मला आला. पहिली पालीच्या कोडीदेवीची, तिची हकिकत मागे सांगितलीच आहे. सन १८९५ असावे. एकवीरा देवीच्या यात्रेचा बेत झाला. आमच्या मंडळींबरोबर माझे (मातुल) आजोबा वामनराव पत्की आणि मामेभाऊ शंकरराव पत्की हेही आले. धाकटा भाऊ यशवंत त्यावेळी असेल चार-पाच वर्षांचा. बैलगाडीने कर्जत गाठले. आम्हा पोरांना येथेच प्रथम आगगाडी पहायला मिळाली. आयुष्यात एक मोठा चमत्कार पाहिला. कितीतरी वेळ आम्ही दोघे भाऊ डब्यांचे शंटिंग पहात उभे होतो. त्यावेळी कर्जत येथे तत्कालीन सुप्रसिद्ध बालबोध-कित्तेवाले बाळकृष्ण मोरेश्वर पोतदार यांचा बुकडेपो स्टेशनसमोर होता. त्यांच्या अंकगणिताची एक प्रत वडिलांनी विकत घेऊन दिली. टेबलावरील काही पुस्तके चाळीत असलेला मला पाहून, पोतदार वडिलांना म्हणाले, "मुलाला आहे वाटतं वाचनाचा चांगला नाद?"
दोन प्रहरी आम्ही कार्ला स्टेशनला जाण्यासाठी आगगाडीत चढलो. त्यावेळी पुण्याची रेल्वे लाईन सिंगलच होती. पोर्टर गादिकांच्या हातात लाल, हिरवा आणि पांढरा असे तीनतीन बावटे असत. लाल म्हणजे एकदम ईष्टाप, हिरवा म्हणजे अगदी हळू सावकाश आणि पांढरा म्हणजे कुछ धोका नही, बेगुमान चले जाव गाडीला मागेपुढे (आत्तासारखीच) दोन इंजिने लागलेली. घाटात बोगदा लागला का गप्पदिशी काळोख पडायचा. दिवे लावण्याची अक्कल मागाहूनची आहे. बारा नि तेरा नंबरच्या बोगद्याला जोडणारा खोल दरीवरचा लोखंडी खांब नि तारांवर उभारलेला एकखांबी पूल होता. त्यावर दोन्ही बाजूंना पाण्याने भरलेली उपडी टिपे ठेवलेली असत.
रेल्वे नोकर सारखे हिरवे बावटे फडकावीत होते आणि गाडी गोगलगाईच्या गतीने चालत होती. खर्र खटक खर्र खटक असा सारखा आवाज निघत होता. प्रवासी लोक "पुंडलीक वरदा हाऽऽरी विठ्ठल" चा जोरजोराने घोष करीत होते. अखेर कार्ला ठेसन आले. त्या छोट्या खेडुती ठेसनला कसला आलाय पलाटफार्म? यात्रेच्या सामानाचा लबेदा मोठा गाठोडी नि गोणती. त्यांना ना गणती माणसे नि गाठोड्यांचे बोजे खाली उतरता उतरता त्रेधातिरपीट, "चला, उतरली सगळी मंडळी नि सामान" असे कोणीतरी म्हणत आहे तोच गाडी चालू झाली आणि माझे मातुल आजोबा बाबा पत्की राहिले तसेच गाडीत. सगळ्यांनी आरडाओरडा केला. गार्डने शिट्या फुंकल्या. त्यावेळी चटकन गाडी थांबविण्याचे ब्रेक जन्माला आले नव्हते. ब्रेक फक्त इंजिनात चांगली हाकेवर गाडी गेल्यावर थांबली. आजोबा उतरले, त्यांना खडीवरून चालत आणले.
देवीचा पुजारी टेकडीच्या पायथ्याशी रहात असे. तेथेच रात्रीचा मुक्काम ठरला होता. मंडळी नि सामान त्याच्या घरी उतरले. रात्रीची आठाची वेळ. पुजाऱ्याच्या मध्यमवयस्क मुलाने आदरसत्कार केला, पण जेव्हा खुद्द वृद्ध पुजारी तात्यांना भेटायला आला, चार शब्द बोलून लगेच घरात गेला, तेव्हा एकदम तात्यांचे फर्मान सुटले, "चला, आत्ताच्या आता वर गडावरच जायचे. इथं पाणीसुद्धा प्यायला रहायचे नाही." एकदम असे काय झाले? गडावर त्यावेळी चिटपाखरुही नसे घरे, रात्री मुलेबाळे आणि दोन म्हातारे, शिवाय गाडीभर सामान घेऊन गड चढायचा तरी कसा अंधारात?
तात्या ऐकेनात, स्वतःच जायला उठले. कारण काय? "आंधळे आहात का तुम्ही सारे? हा पुजारी रक्तपित्या व्यापिष्ट आहे." तात्या म्हणाले. वडील, काका धावले आजूबाजूला आणले कुठूनतरी तीनचार मशालवाले आणि मजूर आणि पुजाऱ्याच्या आग्रहाला धाब्यावर बसवून एक तासाच्या बिकट पायपिटीने यात्रेकरू गडावर पोहचले. बरोबर आणलेला फराळ रात्री केला आणि सर्व मंडळी देवीच्या मंदिरालगतच्या लेण्याच्या प्रशस्त गाभाऱ्यात रात्रभर राहिली. सकाळी नवसासायासाचे विधी उरकले आणि सायंकाळी कार्ल्याला परत येऊन रात्री कर्जत गाठले.
बारामतीचे गण्डान्तर
मी सोळा सतरा वर्षांचा असतानाच १९०२ साली वडील वारले. घराचा कमावता पुरुषच गेल्यामुळे कुटुंबाची अवस्था ओढग्रस्तीची झाली. आजोबांच्या सव्वासात रुपये पेन्शनीवर कसे भागणार? मी निदान मॅट्रिक तरी व्हावे, ही सगळ्यांची इच्छा. महणजे पुढे डिस्ट्रिक्ट प्लीडरची परीक्षा देऊन पनवेलीत वकिली तरी करता येईल. त्या व्यवसायात मी खात्रीने चमकणार, असे सारे गाव बोलत होते.
यापूर्वी पाचसहा वर्षे आमचा नि मेढेकर समर्थ घराण्याचा जिव्हाळ्याचा संबंध जुळला गेला होता. रावसाहेब दत्तात्रय गणेश मेढेकर पनवेलीला मुन्सफ म्हणून आले होते आणि माझे वडील बेलीफ, पण श्रेष्ठ कनिष्ठ नाते न मानता समर्थांनी ठाकरे मंडळींना अगदी जवळच्या नातेवाईकांप्रमाणे वागवले. तो ऋणानुबंध आजदिनतागायत अविच्छिन्न चालू आहे. वडलांच्या मृत्यूच्यावेळी समर्थ बारामतीला बदलून गेले होते. मी बारामतीला यावे, तेथे मॅट्रिकचा अभ्यास करावा आणि परीक्षेला बसावे, या हेतूने त्यांनी पैसे पाठवून मला तेथे बोलावून घेतले.
बारामतीतील वास्तव्यात पाण्याचा कालवा मी प्रथम पाहिला. रावसाहेबांचे चार पुतणे बापू, रामभाऊ, मासकर, दिनकर, मी आणि तेथील एका बेलिफचा पुतण्या भाग्या रोज सायंकाळी कालव्याच्या बाजूला फिरायला जायचो. भांग्या फार मितभाषणी तालिमबाज पण स्वभावाने गरीब मारुतीसारखा तो आम्हा मुलांच्या पाठीमागे असायचा. एकदा तो कालव्यात उतरला. छातीभर पाणी. मग आम्हालाही सुरसुरी आली. उतरलो. मला पोहता यावे, ही फार इच्छा. पण खोल पाण्यात शिरायला धीर कसा होणार? मनात म्हटले ही छातीभर पाण्याच्या नकली नदीची सोय फार छान रोज तीन वाजता आम्ही कालव्यावर पोहायला जाऊ लागलो. थोडथोडे हात मारता येऊ लागले. सुरळ्याही मारू लागलो. काठावरून उड्याही मारू लागलो. पोहायला शिकलो, असे वाटू लागले. भांग्या तर काय, पटाईत पट्टीचा पोहणारा. तो पोहण्याचे नाना प्रकार करीत असे.
कालव्याचे वळण होते, त्या कोपऱ्यावर मी एक दिवस धडाड उडी मारली. वर आलो नि थोडासा पोहून उभा रहायला गेलो, तो तेथे वळणाच्या सोसाट्याने खोल खळगा होता. पाय काही लागत नाहीत असे वाटताच मी घाबरलो आणि लागलो गटंगळ्या खायला. दोनदा बुडून तिसऱ्यांदा वर आलो नाही असे पहाताच भाग्याने उलट प्रवाहाची पर्वा न करता सुरळी मारली नि मला खेचीत बाहेर काठावर आणले. मी तर बेशुद्ध सारेजण घाबरले. पण भांग्याने शांतपणाने माझ्या तंगड्या धरून उचलले आणि जमिनीपासून दोन हातांवर वर उचलून गरगरा फिरवले. तोंडातून भरपूर पाणी पडल्यावर खाली ठेवले. मी शुद्धीवर आलो. झाला इतका शहाणपणा पुरे, असे समजून आमचे टोळके परतले. घडला प्रकार रावसाहेबांच्या किंवा कोणाच्याही कानावर जाता कामा नये, अशा सगळ्यांच्या आणाशपथा झाल्या.
वाड्याच्या दरवाजाशी आमचे टोळके येत आहे तोच माझ्या नावाची परत जबाबी तार घेऊन तारशिपाई उमा. पनवेलची तार "उलट जबाबी प्रकृती कशी काय आहे ते कळव. तात्या फार काळजीत आहेत. तसाच धावलो पोष्टात. आणि जबाबी तार पाठवली" नुकताच बुडता बुडता वाचलो. आता काळजी करण्याचे कारण नाही."
पनवेलला काय घडले?
त्यादिवशी तात्यांनी सकाळचा चहाही घेतला नाही. "आज मला बरे वाटत नाही." इतकेच ते म्हणाले. नेहमीची झाडलोट केली नाही. उदासवाणे खोलीतच बसून राहिले. आंघोळ नाही, देवपूजा नाही. "आज नाही करायची कोणी देवपूजा. राहू द्या देवदेवींना तसेच. दोन प्रहरी चारच्या सुमाराला तर ते खोलीत बसून आसवे ढाळीत असल्याचे आई, आजीने पाहिले. काय झाले? विचारले तर म्हणाले, "आताच्या आता कोणाला तरी सांगून दादाला तार करून त्याची प्रकृती विचारा." मी ज्या क्षणाला बारामतीच्या कालव्यात बुडत होतो. त्या क्षणाला तात्या देवीसमोर उपड्या मांडीने बसले होते. आजवर सेवा केली. त्याचं फळ काय देणार मला बोल? लोकालोकांची कल्याणं केलीस नि माझ्या पदरात आता काय घालतेस ते पहातो. याद राखून ठेव, वेडंवाकडं करशील तर देईन सारा देव्हारा भिरकावून कृष्णाळ्या तळयात असे फुंदकुंदून देवीला गाऱ्हाणे घालीत होते.
इतक्यात माझी तार आली. आणि मग हो काय? म्हातारा देवीसमोर लोळण घेताघेता आनंदाश्रूंनी न्हावून निघाला. घरात या घटनेचा अर्थच लागेना कोणाला. आईने विचारल्यावर म्हणाले, "आता मी निर्धास्त झालो. अग पोराला गण्डान्तर होते गण्डान्तर. आज त्याचा अपमृत्यू होता. जगदंबेने वाचवला. आता त्याला कसलीही भीती नाही. गावातलाच काय, पण सगळ्या इलाख्याचा वकील होईल तो."
मरणाचा दिवस, वेळ आगाऊ सांगितली
`तात्याचा ठरलेला जीवनक्रम नेहमीसारखा चाललेला असतानाच, सन १९०२ च्या प्लेगात माझे वडील वारले आयुष्यात हाच एवढा भयंकर धक्का त्यांना बसला. करता सवरता नि कमावता पुरुषच गेल्यामुळे आम्ही बरेच ओढग्रस्तीला आलो. तो इतिहास योग्य ठिकाणी सांगणारच आहे.
आमचे त्यावेळेपर्यंत कोणाचेच फोटो काढलेले नव्हते. पण सन १९०५ च्या सुमाराला माझा नि `केरळकोकीळ`चे संपादक दादा आठल्ये यांचा पिता-पुत्रवत गुरुशिष्य ऋणानुबंध जमलेला होता. ते फोटोग्राफर, वडलांचा नाही तर नाही. निदान तात्यांचा तरी फोटो काढून ठेवावा, असा मी विचार केला. तात्यांना ती कल्पना रुचली नाही. पण माझ्या हट्टापुढे नमल्यासारखे दाखवून त्यांनी होकार दिला. तसाच धावलो मी दादांना कॅमेऱ्यासह आणायला, दोन मैल दूरवरच्या खांद्याच्या बंगल्यावर (पनवेलनजीक खांदे खेडेगाव आहे. तेथील श्रीमंत आत्माराम शेठ आठवण्यांच्या आंबराईतल्या टुमदार बंगल्यात दादांचे वास्तव्य असे.) आम्ही घरी येऊन पहातो तो काय? आयुष्यभराचा नियम मोडून तात्या घोड्याच्या टांग्यात बसून उलवा मार्गे मुंबईला पसार! आम्ही बसलो हात चोळीत.
मुंबईला जे जे आमचे जवळंदूरचे नातेवाईक होते त्यांना तात्या भेटले आणि अमुक दिवशी आम्ही जाणार. तेव्हा अखेरची भेट द्यायला मुद्दाम आलो. असे ज्याला त्याला सांगत सुटले. अंथरुणाला खिळलेली त्यांची एक बहीण डहाणूला जयवंताकडे होती. तिच्याही भेटीला गेले. (डहाणूचे जयवंत याच म्हातारीचे वंशज.) तात्या म्हणाले, "किती दिवस अशी कुजत पडणार? चल, अमुक दिवशी मी जातोय. तू ये लगोलाग माझ्या मागून." असे तिला बजावून तात्या आणखी काही ठिकाणी फिरले नि परत आले. आम्हाला कोणालाही मात्र काही सांगितले नाही.
एक दिवस सकाळी नित्यक्रमाप्रमाणे तात्या विहिरीतून पाण्याच्या बालद्या ओढून झाडांना पाणी घालीत तेथून जाणाऱ्या येणाऱ्या ओळखीच्यांना "अहो, आज रात्री नऊ वाजता आम्ही जाणार बरं. मुलाबाळांवर लक्ष असू द्या." असे हात जोडून सांगत सुटले. कसे कुणाला खरे वाटणार ते? पंच्याण्णव वर्षांचा तगडा म्हातारा, जवानांना लाजवील अशा तडफेने भराभर पाणी काढतो आहे नि म्हणे आज आम्ही जाणार!
नारायण ऊर्फ नाऱ्या केळकर नावाचा तात्यांचा एक निस्सीम भक्त होता. तो पगडबंद होता. नेहमीसारखे अंगावर उपरणे टाकून तात्या देवदर्शनाला गेले नि नाऱ्याला घेऊन परत आले. त्यांची चर्या फिरलेली होती. माझ्या आईने पाहिले तो सडकून ताप भरलेला. "थांबा हं. आणते औषध" असे ती म्हणते तोच, "हे बघ, औषध विवषध काही नको. मरणाला काही तरी कारण लागत असते. म्हणून हा ताप. तो टळणार नाही." मी आणि धाकटा बंधू यशवंत दोघेही त्यावेळी मुंबईला होतो. तात्यांच्या आजाराची बातमी गावभर फैलावताच जो उठला तो आमच्या घरी धावतच आला. तात्या बिछान्यात निपचित पडलेले. मधूनमधून किती वाजले रे असे दोनचारदा विचारले. सरकारवाड्यातले नवाचे टोले कानी पडताच `राम` गर्जना करून तात्यांनी प्राण सोडला. मरणाचे भाकित अक्षरशः खरे झाले.
प्रकरण २
किंचित जुने पनवेल-दर्शन
मुंबई-खोपोली-पुणे हमरस्त्यावरचे पनवेल म्हणजे मऱ्हाठशाहीच्या काळात, मुंबईकर इंग्रज आणि साष्टीकर फिरंगी यांच्या हालचालीच्या नाकेबंदीचे घाटपायथ्याचे जबरदस्त ठाणे होते. उलव्यानजीकचा बेलापूरचा किल्ला समुद्रमार्गे होणाऱ्या त्याच्या हालचालींना रोखण्यास ताठ उभा असे. सरकारवाडयानजीक श्रीमंत दाण्डेकरांचे घर आहे. तेथे पूर्वी छत्रपतींची नाणी पाडणाऱ्या शंकर सोनाराची कंत्राटी टाकसाळ असे. ब्राह्मण आळीत वैशंपायन वकिलांच्या घरासमोर नाना फडणीसाची अखेर नंबराची आठवी पत्नी जिऊबाईसाहेब यांचा चौसोपी चिरबंदी वाडा होता. याच ठिकाणी बाईसाहेबांची आणि डयूक ऑफ वेलिंग्टनची इतिहासख्यात मुलाखत झालेली होती. काही वर्षे पडक्या वाड्याच्या त्या जागेवर नाटके होत असत. नाटकवाले थेटराची जागा म्हणून `देशमुखांची बखळ` असा जाहीर उल्लेख करीत असले, तरी पनवेलचा महिलावर्ग आग्रहाने `बाईसाहेबांचा वाडा` असाच उल्लेख करीत असे. सध्या त्या जागेवर धूतपापेश्वरचे इस्पितळ उभे राहिलेले आहे.
पनवेलचे राजा भोज
एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात श्रीमंत विठोबा खंडाप्पा गुळवे म्हणजे पनवेलचे राजा भोज समजले जात असत. त्यांच्या अमदानीत पनवेल म्हणजे अनेक कलावंतांचे आश्रयस्थान होते. त्यांचा हरजिनसी व्यापार फार मोठा. सर्वत्र त्यांच्या पेढीच्या शाखा फैलावलेल्या. वडाळ्या तळावरील खंडाप्पाचा बाग पनवेलचे एक महान भूषण नि आकर्षण होते. तेथील प्रशस्त बंगल्यात अनेक नामांकितांनी गुळव्यांचा राजेशाही पाहुणचार उपभोगलेला आहे. अवघ्या मिया सुतार चित्रकाराच्या कुंचल्याची करामत जशी येथे गाजलेली आहे, तशी सुप्रसिद्ध अण्णासाहेब किर्लोस्करांची रसाळ नाट्यवाणी रामराज्यवियोग नाटक रचनेच्या वेळी फुलारलेली आहे.
अलिकडच्या काळात कमरेपासून पंगू झालेल्या कादंबरीकार नाथमाधवांच्या कादंबरी लेखनाचा प्रारंभ याच बंगल्यात झाला आणि `महाराष्ट्र-भाषा-चित्रमयूर` कृष्णाजी नारायण ऊर्फ दादा आठल्ये, केरळकोकीळचे संपादक यांच्या रसाळ काव्याचे आणि काव्यशास्त्रविनोदाचे भरगच्च कार्यक्रम येथेच झाले. त्यांचा नि माझा गुरुशिष्य ऋणानुबंध येथेच आला आणि तो त्यांच्या मृत्युक्षणापर्यंत अखंड टिकला. विठोबा अण्णा गुळव्यांच्या मागे त्याची परंपरा त्यांचे नातू नि माझे जिवस्य कण्ठस्य स्वाध्यायबंधू श्रीमंत आत्माराम शेट आठवण्यापर्यंत अबाधित चाललेली होती. श्रीमंत विठोबाशेटच्या परिसरात माझे मातुल आजोबा वामनराव जिवाजी पत्की, वकील, यांचे प्रस्थ फार मोठे. घरादारात ते `बाबा` म्हणूनच सर्वश्रुत होते. बाबा पत्क्यांच्या शब्दाशिवाय विठोबाशेटचे प्यादे हालायचे नाही. दोघेही नवरसाचे रसिक भोक्ते नाटक मंडळी असो, तंतुवादक, कवी, शाहीर फार काय पण तमाशेवाल्या कोल्हाटणीचा भटक्या फड असो.
गावात पाऊल टाकताच, त्यांची पहिली सलामी पत्की वकिलांच्या ओटीवर झाल्याशिवाय, गावभर भटकूनही कोणी त्यांची दाद घ्यायचे नाहीत. मग विठोबाशेटकडे लग्गा लागणे दूरच, विठोबा अण्णा गुळवे शिवोपासक लिंगायत आणि बाबा पत्कीही उत्कट शिवोपासक दोघांच्या निकट स्नेहात हा शिवोपासनेचा धागा जबरदस्त असे. कलावंतांना उत्तेजन देण्यात दोघांच्याही दातृत्वाचा हात नेहमी पुढे बाबांनी दहा रुपये पुढे केले का विठोबाशेटचे चट्दिशी बाहेर पडायचे. कलावंतांची गोष्ट कशाला? बाबांच्या मध्यस्तीने बण्डवाले वासुदेव बळवंत फडक्यांनीसुद्धा गुप्त भेटीगाठीत विठोबाशेटच्या गुप्तदानाचा लाभ वरचेवर घेतलेला आहे.
फडक्यांच्या दरोड्यांनी पनवेलची दशक्रोशी जरी अनेक वेळा हबकली दबकली गेली, तरी पनवेलला त्यांचा कसलाच उपसर्ग न होण्याचे कारण या गुप्त ऋणानुबंधात होते. संगीत नाटक मंडळींची कल्पना नि योजना निश्चित झाल्यावर गुळव्यांच्या प्राथमिक आश्रयासाठी अण्णासाहेब किर्लोस्करांनी पनवेलचा पहिला फेरफटका केला, तेव्हा "बाबा पत्क्यांना गाठा की झालेच तुमचे काम" असे अनेकांनी सुचविल्यावरूनच, किर्लोस्करांना कामचलाऊ भांडवल आणि पुण्यात नाटकाच्या तालमी नि बिऱ्हाडासाठी सोमवार पेठेतील गुळव्यांची हवेली मोफत वापरायला देण्यात आली.
औंधच्या चित्रकार भिवा सुताराला मुद्दाम बोलावून, विठोबाशेटनी, आपल्या पत्नीचे (सौ. राधाबाईचे) तेली रंगातले भव्य चित्र जसे काढवून घेतले त्याचप्रमाणे, पुणे येथील महाराष्ट्राचा पहिला वेट प्रोसेसने फोटो काढणारा फोटोग्राफर हरिश्चंद्र चाचड, यालाही गुळव्यांनी मुद्दाम पनवेलला बोलावून घरातल्यांचे नि स्नेहीजनांचे फोटो काढून घेतले होते. त्यांच्या संग्रहाची दोन आकर्षक आल्बमे वडाळा बांगेच्या बंगल्यात टेबलावर ठेवलेले असत. त्यांतूनच मी वासुदेव बळवंत फडके यांचा हाफकार्ड साईज फोटो शोधून काढला. आत्मारामशेटने त्याचे एक एन्लार्जमेंट श्री. तात्या पाटकरांमार्फत मुंबईहून तयार करवून आणले आणि दप्तराच्या खोलीवर टांगले, पुढे स्वदेशी आणि वन्देमातरमच्या चळवळीत नसती भानगड घरात नको म्हणून ते कोठेतरी ठेवले. मीही दोनतीन एन्लार्जमेंट्स तयार करून विकली. त्यातली एक प्रत चित्रशाळेतल्या काका जोश्यांना दिली. ही सर्व भानगड वृत्तपत्रात पुराव्यासह चर्चिली गेली. खुद्द आत्मारामशेटच्या समोरही रुजुवात केली. तरी फडक्यांचे चरित्र छापणारे फडके ते चित्र आम्हीच प्रथम उजेडात आणले या हेक्याला चिकटून बसले ते कायम!
शक्त्युपासनेला शिवोपासनेची जोड
पितामह तात्यांची शक्त्युपासना आणि मातुल आजोबा बाबा पत्की यांची उत्कृट शिवोपासना यांचा माझ्या चरित्र व चारित्र्यावर फार मोठा परिणाम झालेला आहे. बाबा पत्की आपल्या काळी पनवेलचे अग्रमानाचे नागरी पुढारी ते जसे रंगेल होते तसेच रंगेलही होते. त्यांच्या लोकसंग्रहात सर्व प्रकारचे नि सर्व दर्जाचे लोक असायचे. रामा गवंडी नावाचा एक वृद्ध गृहस्थ म्युनिसिपालिटीच्या कामाची कंत्राटे घेत असे. तो शीघ्र कवी होता आणि बाबांच्या ओटीवर त्याची सकाळ-संध्याकाळ बैठक असे.
बाबांचे पूर्ववृत्त आम्हाला कोणालाच माहीत नाही. कधी त्यांनी सांगितलेही नाही. एखादे वेळी आम्हा मुलांच्या शिक्षणाबद्दल गोष्टी निघाल्याच, तर त्रोटक काही सांगत. त्यावरून कळले. ते हेच. लहानपणीच बाबांचे वडील वारले आणि त्यांच्या मातुश्रीने काबाडकष्ट करून या आपल्या एकुलत्या एका मुलाला वाढवले. मावशीचाही थोडा आधार असे. कारण विरुपाक्षाच्या देवळाला बाबांनी आई नि मावशी यांच्या स्मरणार्थ दीपमाळ बांधलेली आहे. त्याकाळी व्यवस्थित शाळा नव्हत्या. गावठी पंतोजीच्या शाळेत मराठी शिक्षण पुरे झाल्यावर, इंग्रजी शिकण्यासाठी मिशन-यांनी चालविलेल्या खाजगी शाळेत ते जात असत, शिक्षण मोफत.
पनवेल येथे स्थायिक ख्रिस्ती मिशन नव्हते, तरी काही गोरे मिशनरी इंग्रजी विद्या मोफत शिकविण्याचे, मुलांना मोफत पुस्तके देण्याचे कार्य करीत असत. मिशनऱ्यांच्या शाळेत वामन जात असतो, तेव्हा आज ना उद्या हे पोरटे बाटणार आणि बिचारी आई उघडी पडणार, या ठराविक विकल्पांनी घेरलेल्या शेजारपाजाऱ्यांनी तिला घाबरवून सोडली. बाबांनी इंग्रजी विद्येचे महत्व तिला वरचेवर सांगावे. पण ते सारे तेवढ्यापुरतेच शाळेतले कपडे दाराबाहेर ठेवायचे आणि आंघोळ करून घरात पाऊल टाकायचे, असा रोजचा कार्यक्रम. एके दिवशी वाचनाचे इंग्रजी पुस्तक वामनने घरात आणले, त्याला होते चामड्याचे कव्हर, मग हो काय विचारता? सारे घरच भ्रष्ट झाले की आईने त्रागा केला आणि "आमचे आकटो विकटो इंग्रजी शिक्षण थांबले त्या दिवसापासून." बाबा हसत म्हणायचे.
वयात आल्यावर त्यांनी मामलतदार कचेरीजवळ बसून, लोकांच्या फिर्यादीचे अर्ज, गहाण खते, इत्यादी लिहिण्याचे काम चालू केले. त्यावर चांगली कमाई होऊ लागल्यामुळे, मातोश्रींच्या काबाडकष्टाला साहजिकच हक्काची सोडवणूक होत गेली. हे काम करीत असतानाच, त्यांनी कायद्याच्या पुस्तकांचा अभ्यास करून पनवेलच्या दिवाणी-फौजदारी कोर्टात वकिली करण्याची सनद घेतली. थोड्याच दिवसांत त्यांचा चांगलाच जम बसला. फौजदारी खटल्यात तर त्यांचा नावलौकिक कुलाबा जिल्ह्यात दुमदुमला. पैसाही रगड येऊ लागला.
पनवेल येथे एक प्रशस्त घर बांधले. काही जमीनही खरेदी केली. बोटांत किंवा करागुळीत सोन्याचे सल्ले घालण्याऐवजी, बाबांच्या उजव्या हाताच्या तिन्ही बोटांत सोन्याची जोडवी आम्ही पाहिलेली आहेत. पनवेलच्या पत्की वकील घराण्याचे अक्षरशः मूळ पुरुष बाबा पत्की, त्यांनी प्रारंभ केलेली वकिलीची नामांकित परंपरा आज चार पिढ्या त्या घराण्यात अविच्छिन्न चालू आहे. घरही तेच (नवीन आधुनिक सोयी-सुधारणा केलेले) होते तसेच कायम उभे आहे. फार काय, पण हल्लीचे त्यांचे पणतू श्री. मधुसूदन शंकरराव पत्की, बी. ए., एलएल. बी. वकील यांनी बाबांच्या वेळचा दणकट अडसराचा जुना प्रवेश दरवाजा जशाचा तसा कायम राखलेला आहे.
लोकसेवा, धर्मसेवा नि कलासेवा
या सर्व सेवा करताना, आपला हात नि जगन्नाथ, हे बाबांचे धोरण असे. वकिलीची बहुतेक कमाई दानधर्मात आणि कलावंतांच्या उत्तेजनार्थ खर्ची पडत असे. दरसाल भिकाऱ्यांना झुणकाभाकर आणि वस्त्रदान व्हायचे. त्यासाठी अलिबागच्या कलेक्टराकडे पत्र जायचे. सर्व जिल्हाभर मामलतदारांकडून दौंड्या पिटल्या जायच्या. गावचे शेकडो भिकारी ठरल्या, दिवशी पनवेलीस जमा व्हायचे. त्यांच्या बंदोबस्तासाठी अलिबागेहून पोलीसपार्टी यायची. त्याआधी महिनाभर पटणीच्या तांदळाची आणि हरभऱ्याच्या डाळीची पोतीच्या पोती घरामागल्या अंगणात यायची. बापटांच्या वाड्यातील घाटोळी श्रमजीवी बायांची पलटण पिठे दळीत असायची.
दानदिनाच्या आदल्या दिवशी नि संबंध रात्रभर भाकऱ्यांचे ढिगारच्या ढिगार आणि मक्याची मोठमोठी पातेली शिजत असायची. सर्वांनी मोठ्या पहाटेला आंघोळी-पांघोळी करून सज्ज असण्याचा बाबांचा करडा हुकूम सुटायचा, स्नान करून मुंजोबा, घराजवळचा म्हसोबा, राम आणि विरुपाक्षाच्या देवळात जाऊन फुले बेल वाहून बाबा काळया रुळ्यातच परतायचे. घरासमोरच्या पटांगणात (आता तेथे मजली इमारत उभी आहे) भिकाऱ्याचे जथ्थे पोलिसी बंदोबस्तात बसविलेले असायचे. दिवस वर आला म्हणजे बाबा आणि माझी आजी आम्ही हिला यमुची आई म्हणायचे दोघे पायऱ्यांवर उभे राहून प्रत्येक पुरुषाला दोन भाकरी, वर झुणका आणि एक कांबळे, आणि प्रत्येक स्त्रीला झुणकाभाकर आणि लुगडे दान द्यायची. पाच जणांना दान झाल्यावर, बाकीच्या घोळक्याच्या सरबराईचे काम माझे वडील रोहयाहून मुद्दाम आलेला आबा पत्की पार पाडायचे. हे काम दुपारी बारा वाजेपर्यंत चालत असे.
सन १८९६ सालच्या दुर्गादेवीच्या दुष्काळात तर झुणकाभाकर दानाचा एक किंवा दोन जादा प्रयोग झाल्याचे आठवते. लोकोपकाराच्या हरएक कार्यात आपण प्रथम सूतोवाच करायचे आणि मग आजूबाजूच्या धनाढ्यांना त्याचा मुख्य भाग पार पाडण्याची चेतना द्यायची. या एकाच धोरणाने पनवेलीतील अनेक मोठमोठी जीर्णोद्धाराची, ग्रामसेवेची नि दानधर्माची कार्ये बाबांनी पार पाडलेली आहेत. कलावंत किर्तनकार, पुराणिकांच्या संभावनेसाठी किंवा दुष्काळाची सार्वजनिक आपत्तींच्या प्रसंगी त्यांचे हेच धोरण असायचे. प्रथम द्रव्याश्रयाची आपली चिमूट पुढे केली का आपोआप धनाढ्यांच्या उदारतेला पान्हा फुटायचा, तसा न फुटला तर जातीने खटपट करून तो फोडायचा; पण निकडीचे कोणतेही सार्वजनिक हिताचे कार्य तडीला न्यायचेच न्यायचे, त्यांच्या शिवोपासनेची व्याख्या लोकसेवेत सामावलेली असे. आपण देवळाला सभामंडप बांधून द्या, मी दीपमाळ उभारतो. आपण धर्मशाळा बांधा, मी शेजारच्या विहिरीची बांधबंदिस्ती करतो, हेच हयातभर चाललेले होते. त्याचा एक अजरामर दाखला म्हणजे दरसाल महाशिवरात्रीला भरणारी खांदेश्वराची लाखी यात्रा.
स्वयंभू खांदेश्वर प्रगट झाला
मुंबई-पनवेल रस्त्यावर, पनवेलीच्या अलीकडे दोन मैलांवर डाव्या बाजूला एक तलाव आहे. खांदे म्हणजे अवघ्या वीसपंचवीस झोपड्यांचे एक खेडे. हमरस्त्यावरच तलाव असल्यामुळे, पनवेलकर मंडळी आजही सायंकाळच्या फेरफटक्यासाठी तेथवर जात असतात. बाबा पत्की आणि त्यांचे समवयी समव्यवसायी स्नेही दररोज किंवा शनिवारीरविवारी त्या तलावाच्या बाजूला फिरायला जातयेत असत. एखाद्या निवांत जागी मंडळी जाऊन बसली म्हणजे गप्पाटप्पांच्या अवसानात काही ना काही हातचाळे करतातच. या मंडळींनी टोकदार दगडाने बसल्या जागी जमीन उकरण्याचा छंद केला. काही दिवसांनी तेथे एक खड्डाच झाला. बाबा म्हणाले येथे एक छानदार विहीर तयार होईल. खेडवळांना स्वच्छ झऱ्याने पाणी प्यायला. दुसरा डोळे मिचकावीत म्हणाला- कदाचित येथे गाडलेले डबोलेही हाती लागण्याचा संभव नाही कशावरून? (त्याकाळी मोहरा, पुतळ्या, रुपयांचे गाडलेले हंडे, कुणाकुणाला सापडल्याच्या किंवदंत्या रगड असत.)
हा खड्डा खणण्याचा उद्योग चालला असताना, एका दिवशी एक वाटोळा गरगरीत धोंडा दिसू लागला. शंकरभक्त बाबांना तो पिंडीचा भाग असावा असे निश्चित वाटले आणि ते हरहर महादेव गर्जना करू लागले. खास ही महादेवाची पिंडीच असावी. नजीकच्या खांदे गावात हरहर महादेव गर्जनांचा घोष ऐकू जाताच, खेडूत तेथे धावतच आले. "जा जा कुदळी फावडे लवकर घेऊन या" बाबांचा हुकूम सुटला, काळोख पडला म्हणून खेडुतांनी पाचोळ्याचे चुडे पेटवले. धोंड्याच्या आजूबाजूला कंबरभर खणती होताच, साळुंक्यांसह शंकराची पिंडी बाहेर आली. बाबांचा आनंद गगनात मावेना. हरहर महादेवाच्या तडाखेबंद गर्जना करीत ते नाचू लागले.
आजूबाजूच्या खेडुतांची तेथे एक मोठीच यात्रा भरली. रात्र पडली तरी फिरायला गेलेली मंडळी अजून का परतली नाहीत? काही दगाफटका तर नाही ना झाला? (असे अनेक प्रकार त्या रस्त्यावर कधीमधी झालेले होते.) तशात तो सोमवार होता. बाबांच्या उपवासाचा दिवस. घरोघर चौकशा चालू झाल्या. घरातली नि गावतली मंडळी बाहेर पडली. खांद्याच्या रोखाने घोड्यांचे टांगे दौडत सुटले. येऊन पहातात तो काय? शंकराच्या पिंडीवर तलावातल्या पाण्याच्या घागरीच्या घागरी लोक ओतताहेत, पिंडीवर बिल्वपत्राचा ढिगार पडत आहे. खेडुतांची भजनी मंडळी टाळमृदंगाच्या अवसानात भजने गाताहेत आणि बाबांच्या बरोबर पनवेलकर मंडळी हरहर महादेवाच्या गर्जना करीत आहेत.
बाबा पत्क्यांना खांदे गावात श्री शंकर स्वयंभू सापडला, ही बातमी पनवेल गावात फैलावताच पंचक्रोशीतून हजारो आबालवृद्ध स्त्री-पुरुषांचा लोंढाच तिकडे लोटला. पिंडीच्या आसपासची जागा साफसूफ करून, खेडुतांकडून बाबांनी तेथे झावळ्यांचा एक मंडप उभारला. आणि रात्री बाराच्या सुमाराला घरी येऊन स्नान-पूजा करून उपवासाचे पारणे सोडले.
देऊळ कसे बांधले जाणार?
एकदोन दिवसांतच तेथे बांबूच्या तट्ट्याचे नि पत्री छपराचे हंगामी देऊळ तयार झाले. महादेवाच्या पूजाअर्चेसाठी बाबांनी आपल्या खर्चाने एका गोसाव्याची नेमणूक केली. मित्रगणांसह सांजसकाळ तेथे आरतीसाठी ते जाऊ लागले. थोड्याच दिवसांत महाशिवरात्र येणार. काय करावे? देऊळ कसे बांधले जाणार? ही बाबांची विवंचना आता चालू झाली.
या अवधीत एक अकल्पित घटना घडली. बाबांच्या वकिली व्यवसायात अशा घटना नेहमीच घडत असत, पण या क्षणाला तिचे महत्त्व नि माहात्म्य काही आगळेच ठरले, म्हणूनच `अकल्पित` म्हणायचे. मुंबईचा एक गुजराथी व्यापारी दिवाणी दाव्याबाबत बाबांचा वकिली सल्ला घेण्यासाठी मुद्दाम पनवेलीला आला. बिकट भानगडीच्या दिवाणी खटल्यात बाबांच्या कायदे पांडित्याचा सल्ला घेण्यासाठी मुंबईचे बॅरिस्टर आपल्या आशिलांना त्यांच्याकडे पाठवीत असत. (त्याकाळी सॉलिसिटर हा प्राणी जन्माला आलेला नव्हता.) असले घबाड आले का हजार पंधराशे रुपये बाबांच्या खिशात सहजासहजी पडायचे. तशात त्या गुजराथ्याच्या खटल्यात लाखो रुपयांच्या वारसाहक्काचा मुद्दा होता. "कागदपत्र पाहून ठेवतो, येत्या महाशिवरात्रीला सकाळीच अगत्य येऊन भेटा" असे सांगून बाबांनी त्याला निरोप दिला.
देवळासाठी दीपमाळ
महाशिवरात्रीच्या आधी काही दिवस बाबांनी स्वतःच्या नि एकदोन स्नेह्यांच्या मदतीने चिरेबंदी दीपमाळ उभी केली. अहो बाबा, देवळाचा नाही पत्ता नि दीपमाळ आधी कशाला? काही म्हणाले. "अहो दीपमाळ उभी राहिल्यावर तीच देवळाला हाक मारून येथे उभे करील." बाबांचे उत्तर.
महाशिवरात्रीच्या यात्रेचा तो पहिलाच दिवस मोठ्या पहाटेपासूनच हजारो गावोगावचे भजनी ताफे चक्कर पाळणेवाले, मिठाईचे दुकानदार यांची पनवेल-मुंबरा रस्त्यावर रीघ लागली. हरहर महादेव जयघोष आणि भजनांच्या टाळमृदंग ध्वनीने वातावरण दुमदुमू लागले. हा सारा देखावा पाहून बाबा पत्की तर काय? हरहर महादेवाच्या गर्जना ठोकीत टाळ्या वाजवीत अक्षरशः नाचत उडत होते. ब्राह्मणांकडून देवावर अभिषेक होत असताना, त्या मंत्रघोषांनी खांद्याचे निर्जन खेडुती रूप बदलून तेथे साक्षात काशी प्रगट झाली.
ही माझ्या वकिलीची फी
सकाळच्या बोटीने तो गुजराथी व्यापारी पनवेलला आला. पत्की वकिलांच्या घराला टाळे. तपास करून तसाच तो तडक खांदेश्वराला आला. सायंकाळी दीपमाळेवर दीपोत्सव झाला. मध्यरात्रीपर्यंत नेमणूक केलेल्या कीर्तनकारांचे कथाकीर्तन झाल्यावर, श्री खांदेश्वराच्या चांदीच्या प्रतिमेची पालखीतून वाजत गाजत आणि फटाके सुरनळ्यांची धडेबाजी करीत मिरवणूक निघाली. ही चांदीच्या मुखवट्याची प्रतिमा श्रीमंत गोविंदराव बापटांनी दिली होती. सर्व कार्यक्रम यथासांग पार पडल्यावर बाबांनी त्या श्रीमंत शेटजीचा हात धरून त्याला महादेवासमोर उभा केला. "हे पहा, शेटजी, तुमचे कार्य हा श्री खांदेश्वर यशवंत करणार आहे. मी नुसता निमित्तमात्र खटला जिंकलात तर या माझ्या महादेवाला चिरेबंदी देऊळ बांधून देईन. अशी देवापुढे प्रतिज्ञा करीत असाल, तरच मी तुमचे काम हातात धरतो. माझ्या वकिलीची हीच फी आहे. नाहीतर उद्या पारण्याचा प्रसाद घ्या आणि आलात तसे परत जा." त्या शेटजीने देऊळ बांधण्याची प्रतिज्ञा केली.
एका वर्षाच्या आतच बाबांनी दिलेल्या कायदेशीर मुद्यावर त्या व्यापाऱ्याने खटला जिंकला आणि तिसऱ्या यात्रेच्या सुमारालाच चिरेबंदी देऊळ उभे राहिले.
ते काम हातावेगळे झाल्यावर साधुसंतांसाठी आणि वार्षिक उत्सवाच्या सोयीसाठी शेजारी धर्मशाळा हवी, हा वेध लागला. बाबांचे समव्यवसायी स्नेही रावजी महादेव गुप्ते वकील. यांच्याकडून तेही काम करवून घेतले आणि तलावाशेजारी स्वच्छ पाण्याची चिरेबंदी विहीरही अशीच कोणा उदार दात्याकडून बांधून घेतली. दुर्दैवाची गोष्ट एवढीच की दीपमाळ आणि ती विहीर यावरील सारे शिलालेख आज खरचटून नष्ट झालेले आहेत. त्या मुंबईकर शेटजीचा एक ठेचक्या नाकाचा मुनीम दरसाल महाशिवरात्रीला अभिषेक प्रसादासाठी बिनचूक येत असे. हे मी पाहिलेले आहे. पारण्याच्या दिवशी ब्राह्मणभोजन आणि आल्या पांथस्थांना मुक्तद्वार भोजनाचा थाट दुपारी दोन वाजेतोवर चालायचा. पूजेचा गोसावी, कथाकीर्तनकार यांच्या नेमणुकीचा खर्च पत्कीच करीत असत. रेशनिंगच्या हंगामात अलिकडे हा कार्यक्रम बंद पडला. पण बाकीचा खर्च बाबांचे पणतू श्री. मधुसूदन शंकरराव पत्की आजही नियमित चालवीत असतात. पिंपळाच्या फांद्यांनी देऊळ उध्वस्त होऊ लागल्यामुळे काही वर्षांपूर्वी नवरे चॅरिटीजने त्याचा जीर्णोद्वार केला. याबद्दल त्यांना आमचे शतशः धन्यवाद!
श्रीमंत बापट घराण्याची ग्रामसेवा
पेशवाईच्या उत्तर काळात पनवेल येथे विशाल राजेशाही वाडा बांधून स्थायिक झालेले श्रीमंत बापटांचे घराणे प्रमुख गणले जाते. या घराण्याचा इतिहास फारसा प्रकाशात आलेला नाही. तथापि श्रीमंत बापट हे पालखी चवरीचे इतमामदार होते आणि एकोणिसाव्या शतकातल्या पनवेलच्या ग्रामोद्वाराचे बरेचसे श्रेय या घराण्यातील कर्त्या पुरुषांकडे आहे. इतका तरी इतिहास सर्वश्रुत नि सर्वज्ञात आहे. पत्की यांच्या घरासमोरचे श्रीराममंदिर, वडाळे तळयावरील बल्लाळेश्वराचे देऊळ आणि श्रीविरुपाक्षाचे फक्त देऊळ ही सारी गोविंदराव बापट यांच्या वडिलांनी बांधलेली आहेत. श्रीमंत गोविंदराव बापट मी पाहिलेले आहेत आणि या घराण्याचा नि आमचा निकटचा ऋणानुबंध मागे सांगितलाच आहे.
श्रीविरुपक्षाचे देऊळ
हे सन १८७५ सालच्या सुमारास बांधले असावे. प्रथम ते साधारण विटामातीचे घरटेवजा पण चिरेबंदी जोत्याचे होते. देवळाला लागूनच समोर एक विशाल पिंपळाचा वृक्ष आणि त्याचा दगडी चौथऱ्याचा पार बांधलेला होता. त्यामुळे या देवळात पूजा दर्शनासाठी जाण्यायेण्याचीच काय ती सोय असे दहापंधरा माणसे जमली का गर्दी व्हायची. महादेवाच्या देवळाची झाडलोट दिवाबत्ती करणारा एक भोपी नेमलेला असे. त्याचे नाव नागू भोप. आज त्याच नागुचे वंशज विरुपाक्षाची सेवा करीत असतात. वास्तविक देऊळ बापटांचे, पण तेथला भोपी, झाडलोट दिवाबत्ती, महाशिवरात्रीचा आणि त्रिपुरी पौर्णिमेचा दीपोत्सव इत्यादींच्या खर्चाची जबाबदारी पत्की घराण्याकडे– अर्थात बाबा पत्क्यापासून कशी नि का आली, हे मात्र मला समजत नाही.
पिंपळावरचा मुंजोबा
देवळाला जोडून सभामंडप बांधल्याशिवाय कथाकीर्तणे-पुराने होणार कशी, आणि एवढी सोय नसेल तर त्या देवळाची शोभा तरी काय? पण करायचे कसे? समोर प्रचंड पिंपळ आणि त्यावर जागतज्योत मुंजोबा! दररोज मध्यरात्री मुंजोबा बटूची स्वारी शेजारच्या फणश्यांच्या विहिरीवर स्नानाला बाहेर पडायची, हे अनेकांनी पाहिलेले. सभामंडपासाठी पिंपळ उखडल्याशिवाय भागणारच नव्हते. पण हे भयंकर दिव्याचे कर्म करायचे कोणी? पिंपळ तोडणाराचा निर्देश होतो, हा समज अखिल भारतीय आहे. पिंपळाचे झाड तोडायला मजूर तयार असतात, पण प्राण गेला तरी पहिला घाव ते घालायचे नाहीत.
शंकराच्या देवळाचा जीर्णोद्धार आणि तेथे कीर्तने, उत्सव चालू करणे, हा तर बाबा पत्की याच्या आयुष्यातील मोठा छंद. विरुपाक्षाला सभामंडप झालाच पाहिजे. हा त्यांचा निर्धार पिंपळ हालवून सभामंडपाची योजना ठरलीच तर त्याचा नि देवळाच्या जीर्णोध्दाराचा होईल तो खर्च करण्याचे श्रीमंत विठोबाअण्णा गुळव्यांचे वचन बाबांनी मिळविलेले होते. पण पिंपळ तोडायचा कोणी?
भाऊभट जोश्यांनी पेचप्रसंग सोडवला
पनवेलच्या जोशी आळीत भाऊभटांचे नांदते घराणे होते. ते आणि त्यांचे वडील चिरंजीव आबा जोशी दोघांनाही मी चांगले पाहिलेले आहेत. दोघेही उत्कट शिवभक्त. विरुपाक्षाच्या देवळात दररोज तास दीडतास स्तोत्रे, मंत्र पुटपुटत बसायचे आणि अकराच्या सुमाराला पूजा दर्शनवाल्यांची वरदळ कमी झाल्यावर महादेवाची आकर्षक पूजा बांधून जायचे, हा दोघांचा अनेक वर्षांचा कार्यक्रम. सभामंडपाचा प्रश्न त्यांनाही खटकत होता. भाऊभट एकदिवस बाबा पत्क्यांना भेटले. आणि म्हणाले, "बाबा, पिंपळ तोडायची तयारी करा. पहिला घाव हा भाऊभट जोशी घालणार."
सगळया पनवेल गावात आश्चर्याची, कौतुकाची नि धास्तीची बिजली सणाणल्यासारखे झाले. ही कसली भलतीच होड भाऊभट घेतोय, म्हणून त्याचे मन वळवायलाही काही पापभीरू लोक सरसावले, पण झाला निर्धार तो झाला. भाऊभट जोश्याचा शब्द खाली पडायचा नाही. या ठणठणीत उत्तराने सगळ्याची तोंडं बंद झाली.
उजाडला तो आणीबाणीचा दिवस
पाराजवळ पंचक्रोशीतल्या लोकांची झुंबड उडाली. श्रीमंत विठोबाशेट गुळवे, गोविंदराव बापट, सरकारी अधिकारी, वकील, व्यापारी, दांडेकर, वैशंपायन वकील, करंदीकर वकील झाडून नगर श्रेष्ठी हजर झाले. पिंपळावर आणि तोही मुंजोबा असलेल्या पिंपळावर घाव घालण्याचे कर्म श्रेष्ठ धारिष्टापेक्षाही विशेष भाऊभट भल्या पहाटेपासूनच देवळात येऊन स पुत्र स्तोत्रमंत्री जपणी करीत बसलेले होते. त्यांनी श्री विरुपाक्षाची महापूजा केली. सांघिक आरती झाली, कुऱ्हाडीची समंत्रक पूजाही केली आणि ती हातात घेऊन भाऊ जोशी पिंपळाजवळ आले. आजूबाजूला पंचवीस-तीस मजूर आपापल्या कुऱ्हाडी सरसावून उभे होते. भाऊनी पिंपळाची पूजा केली. फुले-अक्षता उधळल्या आणि हातांत कुऱ्हाड घेऊन खणखणीत आवाजात ते लोकांना उद्देशून म्हणाले
"गावकरी सज्जनहो, सभामंडप नसल्यामुळे कथा-कीर्तने पुराणादिकांनी श्री विरुपाक्षाची आपल्याला नीटशी सेवा करता येत नाही. साधुसंतांना निवाऱ्यासाठी येथे जागाही नाही. मला सभामंडप हवा, ही श्रीशंकराची प्रेरणाच वामनराव पत्क्यांच्या तोंडून सारखी बाहेर पडत आलेली आहे. सभामंडप बांधायला श्री भोजराजासमान आपले दानशूर श्रीमंत विठोबाशेट गुळवे सिद्ध आहेत. पिंपळ तोडा नि सभामंडप बांधा ही श्री विरुपाक्षाचीच आज्ञा आहे, असे माझी मनोदेवताही मला सांगत आहे." लोकगंगेच्या रूपाने प्रत्यक्ष श्री विरुपाक्षच येथे उभा आहे. सबंध आयुष्यभर या भाऊभट जोश्याने या माझ्या कुलदैवत विरुपाक्षाची मनोभावाने पूजा-अर्चा केलेली आहे. आणि जीवनमान असेतोवर करणार. सभामंडप बांधला जाऊन तेथे कथा-कीर्तने पुराने भजने यांचा अखंड गजर चालणार असेल, तर तेवढ्यासाठी या भाऊ जोश्याच्या घराण्याची नकल झाली तरी बेहत्तर हा घ्या पिंपळावर पहिला घाव भाऊ जोश्याचा.
भाऊ जोश्याचा पहिला घाव पडताच हरहर महादेवच्या गर्जनांनी सारा आसमंत उफाळून निघाला. तडातडातडा मजुरांच्या कुऱ्हाडीचे घावांवर घाव चालू झाले. थोड्याच दिवसात पिंपळाच्या पाराची जागा सभामंडपासाठी तयार झाली. श्रीमंत विठोबा अण्णांनी उत्तम सभामंडप बांधतानाच, देवळाचाही जीर्णोध्दार केला. शेजारी वामनराव पत्की यांनी आपल्या मातोश्री आणि मावशीच्या स्मरणार्थ दीपमाळ बांधली. उत्सव चालू झाले.
पनवेल येथील श्रीविरुपाक्ष महादेवाचे देवालयाचा व चिरेबंदी जोत्यासह सभामंडपाचे नवीन काम विठोबा खंडाप्पा गुळवे यांनी आपल्या मातुश्री आऊबाई मावशी अंबाबाई यांचे स्मारक म्हणून शके १८०६ आश्विन शुद्ध दशमी सोमवार ता. २१ माहे सप्टेंबर सन १८८४ इसवी या दिवशी पूर्ण केले.
या मजकुराची संगमरवरी शिला देवळाच्या दरवाजाच्या माथ्यावर आजही टिकून आहे.
भाऊ जोश्याला कोण आठवतो?
हे सारे ठीकच झाले. पण जोशी आळीतल्या आबा जोश्यांच्या भाऊभट जोशी वडिलांनी केलेल्या त्यागाची आठवण माझ्या या मुद्रित उल्लेखावरूनच पनवेलकरांना आज-कदाचित पहिल्यांदाच समजणार आहे. भाऊंच्या घराण्यातील आजच्या वंशजानी तरी ही आठवण आता चिरंजीव जपावी. या घराण्यात कोणीतरी एकच पुरुष वंशाला आधार म्हणून टिकतो, अशी परंपरा आबा जोशी मला सांगत असत. सध्या काय आहे ते माहीत नाही.
बाबांची विरुपाक्ष सेवा
देव देवळासाठी जेथून काही मिळण्यासारट असेल, ते हटकून मिळवायचे, हा पत्की बाबांचा एक आणखी छंदच असे. पनवेलीत कृष्णाबाई नावाची एक वेश्या होती. मृत्यूसमयी बाबांनी तिच्याकडून ३५० रुपये दान घेऊन, विरुपाक्षाच्या पिंडीला साळुंका बसविली. दुसरी एक तानी नावाची वेश्या होती, ती अपघाताने भाजली. बाबा तिला भेटायला गेले आणि तिने विरुपाक्षाच्या सेवेला दिलेल्या रकमेतून बाबानी सभामंडपात श्रोत्यांना बैठकीत टेकण्यासाठी चार कठडे आणि देवळालगत बसण्यासाठी दोन भक्कम लाकडी फळ्या बसवून घेतल्या. हे सारे आजही कायम आहे.
गावाचे आद्य मानकरी श्री. बापट
पनवेलच्या देवाळ्या तळ्याच्या काठावर करमल्लीशहाचा एक भव्य दर्गा आहे. सध्याच्या मुंबई-पुणे रस्त्याच्या पनवेलनजीकच्या वळणावर तो हटकून नजरेत भरेल असा दिसतो. येथे मोठा वार्षिक उरूस भरत असतो. श्री. बापट या दर्ग्याचेही उपासक असत.
एक आख्यायिका आहे. एकदा त्या दर्ग्याचा मुजावर अवलिया बापटांवर प्रसन्न झाला. त्याने त्यांच्या पदरात शिजवलेली खिचडी टाकली आणि घरी नेऊन सहकुटुंब हा प्रसाद भक्षण कर, असा आदेश दिला. शिजवलेल्या खिचडीविषयी बापटांच्या मनात साहजिकच विकल्प आला आणि त्यांनी खिचडी देवालया तळ्यात टाकून आपले उपरणे धुतले. घाईघाईने तसेच पिळून ते वाडयात आले. स्वच्छ झटकून दांडीवर वाळत घालीत असताना, त्यांच्या पत्नीला उपारण्याच्या एका टोकाला चिकटलेली चार टप्पोरी मोत्ये आढळली.
हे काय हो? म्हणून विचारता, बापटांनी कपाळाला हात लावून सारी कथा सांगितली. तसेच तडक ते अवलियाकडे गेले आणि केलेल्या अपराधाबद्दल क्षमेसाठी त्यांच्या पायावर पडले, "ऊठ बेटा ऊठ. झाले ते झाले, तुझ्या प्राक्तनात होते तेवढेच तुला मिळाले" अवलिया म्हणाला. बरीच याचना केल्यावर, "बेटा, तुझ्या भक्तीची आता शिलकी बक्षिसी हीच की आजपासून दरसाल माझ्या उरुसातला मध्यरात्रीचा संदल तुझा आणि तुझ्या घराण्यातल्या कर्त्या पुरुषाचा हात लागल्याशिवाय उठणार नाही" करमल्लीशहाचा संदल उठवायला श्रीमंत गोविंदराव बापट दरसाल जामानिमा करून सहकुटुंब जाताना मी अनेक वर्षे पाहिलेले आहे. सध्या काय प्रघात आहे तो माहीत नाही.
पनवेल येथील रेडे-बलिदानाची हकिकत
माझे जन्मग्राम पनवेल, तेथलीच हकिकत सांगतो. तेथल्या एका शाळेबाहेरच्या म्हसोबाच्या रेडे-बलिदानाची जबरदस्त गडबड, पहाटेला म्हसोबाच्या महापूजेसाठी महार, आगरी वगैरे जमातींची गर्दी उसळायची. म्हसोबाची जागा झेंडूच्या फुलांच्या राशींनी भरून जायची. बलिदानासाठी आणलेल्या रेड्याचे, कर्कश किंकाळ्यांत म्हसोबापुढे नाक छाटण्यात येई. रक्तप्रवाह चालू झाला की झेंडूच्या माळांनी आणि शेंदराच्या पट्ट्यांनी बरबटलेल्या रेड्याची वाजतगाजत ग्रामप्रदक्षणेसाठी मिरवणूक निघायची. वाटेने रेड्याच्या रक्ताची धार सारखी वहात असायची. गावच्या सीमेभोवतालची फिरवणी संपली की, दुपारी एकच्या सुमारास गावातल्या मोठ्या रस्त्याने ती मिरवणूक जायची. तो देखावाच फार भयंकर वाटायचा. महारी कर्कश वाजंत्री वाजताहेत, लोक गर्जना करताहेत, आरोळ्या ठोकताहेत. म्हसोबाचे वारे अंगात संचारलेला असामी आरोळ्या ठोकीत अग्रभागी उड्या मारीत चालायचा. जागोजागची पोरेटोरे घाबरून किंकाळया मारीत घरात पळायची.
बलिदानासाठी खोंडरेडा मिळवावयाचा कसा?
सुखासुखी घरातल्या गोठ्यातला खोंडरेडा थोडाच कोण बलिदानासाठी देणार? मग शेतकऱ्याचे सोंग घेऊन काही महार दूरदूरच्या खेड्यांत भटकून, म्हैस फळवायला खोंडरेडा विकत घ्यायचा आहे. वगैरे भुलथापा मारून विकत घ्यायचे, पडेल ती किंमत द्यायची.
एकदा एका गरीब शेतकरी बाईचा तरणाताठा खोंडरेडा पैदा केला. तिला मागाहून समजले की तो म्हसोबाला बळी द्यायला नेला. मग हो काय? ती बिचारी आकांत करीत नेमक्या दसऱ्याच्या दिवशी पनवेलला धावतच आली. पहाते तो काय? तिचा लाडका रेडा मिरवणुकीला निघालेला! अरे बाबांनो, मागाल तितके पैसे देते, पण माझ्या गोजिरवाण्या लेकराला ठार मारू नका रे अशा आक्रंदून विनवण्या करीत रडत कोकलत मिरवणुकीच्या भागोमाग ती भटकत होती. कोण तिची दाद घेणार? गावतल्या फौजदाराला नि पुढाऱ्यांना ती भेटली, पण ज्याने त्याने मुगाची मूठ तोंडात कोंबलेली अनेकांच्या डोळ्यांतून आसवे वाहिली पण करणार काय? देवकार्य नि तेही गावकीचे पडले ना?
बलिदानाचा विधी असा साजरा व्हायचा
अखेर रात्री आठ-नवाच्या सुमाराला म्हसोबाच्या जागेवर बलिदानाचा विधी व्हायचा. सभोवार महार मंडळींचा गराडा पडलेला. गणू ठाणग्याच्या (हा आगरी जातीचा होता) अंगात म्हसोबाचा संचार व्हायचा. हातात तलवार घेऊन तो सारखा घुमायचा, आरोळ्या ठोकायचा आणि गरगर फिरवायचा सहासात घट्टेकुट्टे महार रेड्याला जाडजूड दोरखंडांनी बांधून संचारी म्हसोबापुढे त्याची मान समोर धरायचे. ठाणग्याने तलवारीचा वार रेड्याच्या मानेवर घातला रे घातला का मोठा जयघोष व्हायचा, महारी वाजत्री किंकाळायला लागायची. लगेच महार मंडळी सुऱ्यावर सुरे चालवून मान कापायचे नि शीर म्हसोबापुढे ठेवून, धड बाजूला न्यायचे. भराभर विच्छेदन व्हायचे.
आता खरोखर नवल वाटेल, पण त्या प्रसादाच्या वाटणीत अनेकांच्या मानपानाचा भाग असे. पहिला वाटा बापट घराण्याचा, दुसरा गावपाटलाचा (तो होता मुसलमान), तिसरा कुळकर्ण्यांचा, तो स्वीकारण्यासाठी त्यांना तेथे हजर रहाणेच भाग पडे. ते सारे यायचे आणि देवा पावलो असे पदर पसरून म्हणायचे नि जायचे. बाकीचा सारा फडशा उडवायाला महार मंडळी टोपल्या घेऊन आलेली असे.
नव्या जमान्यात बलिदान कायद्यानेच बंद केल्याने ते बोरीचे झाड आणि तो म्हसोबा आता फरारी झाले आहेत.
यावर एका पनवेलकराने रागारागाने मला पत्र लिहून कळविले की "ते बोरीचे झाड नि तो म्हसोबा कोणीही फरारी झालेले नाही. होते तेथेच कायम आहेत." याला मी मार्मिकमध्ये दिलेले उत्तर
हॅलो! डिअर मिस्टर म्हसोबा!
पनवेलच्या मराठी शाळेजवळील बोरीच्या झाडावरील म्हसोबाविषयी माझ्या जीनवगाथेत लिहिताना, ते बोरीचे झाड नि तो म्हसोबा फरारी झाल्याचे लिहिले होते. याबाबत दस्तुरखुद्द श्रीयुत म्हसोबाचे मला पत्र आले आहे. त्यात तो म्हणतो- "अजूनही माझे वास्तव्य सरकारी मराठी शाळेजवळच्या बोरीखालीच आहे आणि तेथून मी कोठेही फरारी झालेलो नाही."
खुद्द `ओल्ड डिअर फ्रेंड` म्हसोबानेच हा खुलासा केल्यामुळे माझी (नजर) चूक मी एकदम कबूल करतो. माझ्या बरोबरीचे कितीक तरी जुने दोस्त आज दिवंगत झाले आहेत. पण बिगरयत्ता ते चवथीपर्यन्त ज्या शाळेत शिकत असताना, आम्ही पोरे मास्तरांना करांगुळीचे सिग्नल दाखवून घोळक्याने एकी साठी बाहेर पडून, ज्या म्हसोबाच्या आजूबाजूला बसत असताना. किंवा बोरांसाठी भिरकावलेले धोंडे कचाकच टाळक्यावर पडताना जो चुकून एकदाही कधी आमच्यावर गुरगुरला नाही. किंवा भलत्याच जागी त्याने नायट्याचा चट्टा पाडला नाही, तो आमचा जुना दोस्त म्हसोबा आजही चिरंजीव ठाम बोरीखाली उभा असल्याचे वाचून खरोखर आयॅम ट्रिमेण्डसली हॅपी. अरे म्हसोबा, मी तुझ्याबद्दल तसे लिहिल्यामुळे राग येणे साहजिक आहे. मी तुझी क्षमा मागतो आणि या जाहीर खुलाशाने तमाम महाराष्ट्राला डिक्लेअर करतो की पनवेलची जुनी दुनिया सफाचट नष्ट होऊन, कालमानानुसार त्या शहराचा मुखवटा अपटुडेट मॉडर्न झालेला असला, तरी आमचा लंगोटीयार शाळासोबती महामना म्हसोबा जस्सा होता तस्सा आजही त्याच बोरीखाली कायम ठाणावर ठाणबंद उभा आहे. बस्स झाले समाधान?
तुझा- केशव ठाकरे
मेंढा कंदुरीचा दुसरा प्रयोग
हा व्हायचा पनवेलच्या पत्की वकिलांच्या घराजवळ, मामलतदार कचेरीला जाताना हा म्हसोबा वाटेतच तिवाट्यावर उभा. त्यावेळी ते तीनचार फूट उंच, एक फूट जाडजूड होता. अलिकडे अनेक वर्षांत म्युनिसिपालिटीने रस्तारुंदीचे नि सडकेवर भर घालण्याचे काम अव्याहत हाती घेतल्यामुळे, तो आता सडकेवर फूट दीड फूटच शिल्लक राहिला आहे. धड तो सडकेच्या मधोमध नाही का अजिबात बाजूलाही नाही. त्यामुळे ट्राफिकला कायमचा अडथळा.
दर दसऱ्याला पनवेलकर नागरिक मामलतदार कचेरीत जमायचे. मग मामलतदारादी अधिकाऱ्यांना अग्रभागी घेऊन ताशे वाजंत्री वाजवीत मिरवणूक निघायची. ती मिरवत मिरवत गावाबाहेरच्या खाडीवरल्या पुलावरून खाली उतरायची. (मुंबई-पुणे रस्त्यावरचा पुल, मागे जो कोसळला होता आणि मिलिटरीने जुजबी चालू केला होता तो.) तेथे गावकीच्या महाराने सोन्याच्या डहाळी- फांद्यांचा भला मोठा ढीग रचून ठेवलेला असे. भटजी, पळीपंचपात्री पूजासाहित्यासह हजर असे मामलतदार पाटावर बसून सोन्याची पूजा करायचे.
गावकीच्या महाराला ठराविक द्रव्यदान करायचे नि मग लोक सोने लुटायचे. झुंबड उडायची. सोन्याच्या लगडी घेऊन मिरवणूक वाजत गाजत परतायची. इकडे म्हसोबापाशी पोलीस बंदोबस्तात एक मेंढा आणून उभा केलेला असे. मिरवणूक जवळच्या चव्हाट्यावर आली रे आली की महार मंडळी मेंढ्याची मान कापून त्याच्या तोंडात तंगडीचा एक पाय अडकवून म्हसोबापुढे ठेवायची. मिरवणूक जवळ आली की मामलतदाराने पायातले जोडे काढून सावडलेल्या रक्तात डाव्या पायाचा अंगठा बुचकळून कचेरीकडे जायचे. मागाहून सगळे लोक हेच करून कचेरीत जमा व्हायचे. तेथे पानसुपारी अत्तर गुलाब होऊन सर्वजण दसरा छान पार पडला या भावनेने घरोघर परतायचे.
चारीमुंडे चीत हम बताते हैं
के. आत्मारामशेट आटवणे यांच्या देवडीवरचा पुरभय्या एकदा रजेवर गावी गेला. त्याच्या बदली एक रजपूत नेमला होता. तो जरीचा पटका नि जामानिमा करून कमरेच्या तलवारीसह संध्याकाळी भ्रमंतीसाठी गावभर भटकायचा. त्याने हा मेंढा कंदुरीचा देखावा पाहिला नि खदखदा हसला क्या हैवान लोग है ये. छुरी लेकर कुचुकुचु क्या काटते है? समसेरसे एकही झटकेमे चारीमुंडी चीत करना चाहियें. दुसऱ्या वर्षी त्याने मेंदा कापण्याच्या प्रयोगाची परवानगी काढली. मिरवणूक येऊन उभी राहिल्यावर त्याने आपल्या तलवारीने असा एक जोरदार वार केला की मेंढ्याची मुंडी नि चारी तंगड्या खट्दिशी काटल्या गेल्या.
अहिंसावादी मामलतदाराची जिरली
एका वर्षी एका ब्राह्मण मामलतदाराने ही कंदुरी बंद पाडली. असले कसले हिंसावादी देव? बंद करा हा प्रयोग त्यांचा हुकूम सुटला. मिरवणुकीचा नि पानसुपारीचा कार्यक्रम पार पडला नि रावसाहेब घरी गेले. आणि महाराजा काय सांगावे? त्यांच्या पोटात जो घुम्मक उठला तो काही केल्या थांबेचना डॉक्टर वैद्य कोळून पाजले. पण घुम्मक वाढतच गेला. मग कोणी सुचविल्यावरून साहेबांनी दुसऱ्या दिवशी मेंढा कंदुरीचा म्हसोबासमोर प्रयोग करविला आणि काय आश्चर्य पहा! रक्तात अंगठा बुचकाळताच धुम्मक बंद, देवस्थानच कडक ना ते? आता हा प्रकार सबंध महाराष्ट्र राज्यात कायद्यानेच बंद पडला आहे. कायद्याच्या पोटात धुम्मक कसा घालावा हा एकच प्रश्न सगळ्या म्हसोबांच्या पुढे आता पडलेला असावा.
रखेल्यांची रूठी प्रतिष्ठित
रखेलीची रूढी जशी प्रतिष्ठित मानली जात असे, तशा त्या रखेल्याही प्रतिष्ठितच असत. विवाहित गृहणीशिवाय जादा एकदोन रखेल्या बाळगणे, हे त्याकाळच्या बहुतेक इभ्रतदार नागरिकांच्या प्रतिष्ठितपणाचे गमक समजले जात असे. कोणी कोण ठेवलेली आहे. हे सगळ्यांना माहीत असले, तरी त्याविषयी फारसा गवगवा, चर्चा किंवा टीका होत नसे. त्या बायासुद्धा संभावित गृहिणीच्या निष्ठेनेच वागणाऱ्या असत. रस्त्याने जातायेताना माथ्यावर पदर आणि पायांत पुणेरी जोडे अथवा वहाणा घालून खालच्या मानेने जाणे. ही त्यांना ओळखण्याची खूण. कित्येकांची बिऱ्हाडे स्वतंत्र असायची आणि तेथला त्यांचा सर्व खर्च त्यांचे यजमान करायचे. कित्येकजणी यजमानाच्या सौभाग्यवतीच्या बरोबरच घरात असायच्या, इतकेच काय पण सार्वजनिक सणावारी अथवा उत्सवांत दोघी बरोबरीने गेल्याच तर गावकरी महिलाही त्यांना योग्य त्या आदरानेच वागवीत असत. आजकालच्या कॉलेजी नि नोकरमान्या तरुणीत हमखास दिसणारा नखऱ्याचा फाजील चवचालपणा आणि देहविभागांच्या प्रदर्शनाचा जो उच्छृंखलपणा माजलेला दिसतो, तो त्याकाळच्या रखेल्यांत नमुन्यालाही कधी कोणाला दिसला नाही.
माझीही अशी एक आजी होती
तिचे नाव घारी, त्या तिघी बहिणी होत्या. मरी, सखू आणि घारी. मी त्यांना फार उतार वयात पाहिले. बापटांच्या वाड्यात एका कोपऱ्यावरच्या प्रशस्त घरात त्या रहात असत. मरी नावाप्रमाणे नेहमी खाटेवर मरत पडलेली असायची. तिला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. मुलगा चांगला शिकला सवरला आणि वयात आल्यावर हाजी कासम बोट कंपनीत उलवे बंदरावर तिकीटमास्तर म्हणून तो कितीतरी वर्षे नोकरी करीत होता. आम्ही त्याला गाडगीळकाका म्हणायचे. त्याचा वंश चालू आहे. मुलगी चंद्रा हिने एका अस्सल मराठाजातीय तरुणाशी विवाह करून संभावित गृहिणीपदाचा मान मिळवला. दुसरी सखू हिला एक मुलगा झाला होता, तो सहा महिन्यांचा होऊन वारला. तिचे त्याच क्षणाला यजमानाचा त्याग करून संन्यस्त वृत्ती पत्करली, ती शेवटपर्यंत.
तथापि माझ्या मातुल आजोळी किंवा आमच्या घरी काही उत्सव, समारंभ, कुळधर्म वगैरे असला तर सखू नेमकी येऊन पडेल त्या कामाचा भार उचलायची. घारी घाऱ्या डोळ्यांची, गोरीपान, उत्तम उभार बांध्याची, पांढऱ्या शुभ्र केसांची पण हजारांत उठून दिसणारी पोक्त बाई. पत्की बाबांच्या घरच्या प्रत्येक कार्यात ती आणि सखू बरोबरीने सामील व्हायच्या. एखादे वेळी त्यांना यायला उशीर लागला पुरे, का बाबा एकदम खवळून सर्वासमक्ष हजेरी घ्यायचे, पण त्या बिचाऱ्या मुकाटतोंडी घरात जाऊन कामाला लागायच्या.
मातुल आजीप्रमाणे सखू, घारी आमच्याकडे कोणी आजारी पडले. (बहुतेक माझाच लहानमोठा आजार असायचा) का धावून यायच्या. त्यांचा आम्हा मुलांवर फार लोभ असायचा. पटांच्या वाड्यात आमची हायस्कूल शाळा असे. तेथे जातायेता मी त्यांच्या दृष्टीला पडलो की `काय रे रोड्या` म्हणून त्यांची हाक येऊन घरातली सारी चौकशी व्हावयाची. आजोळी भाद्रपदातले पक्षाचे ग्रामभोजन असो, खांदेश्वराची यात्रा असो, किंवा झुणका भाकरदान समारंभ असो, त्यावेळी त्या दोघी श्रमसाहसाला टिपल्या यायच्या.
खांदेश्वराच्या देवळाला लागूनच बाबांनी एक खाजगी पडवी बांधलेली असे. महाशिवरात्रीला मोठ्या पहाटे आमचा मुक्काम तेथे व्हायचा. इकडे यात्रेचा धुमाकूळ आणि त्या पडवीच्या उघड्या ओट्यावर माझ्या दोन्ही (मातुल आणि पितृल) आज्यांच्या बरोबरीने सखू घारी भाज्या चिरताना, डाळतांदूळ निवडताना दरसाल हजारो लोक पहात असत. पारण्याच्या दुसऱ्या दिवशी भोजने आटोपल्यावर सायंकाळच्या सुमाराला दोघीही पायीपायी पनवेलला परत जात असत. त्यांच्याविषयी चुकूनही कधी आम्हाला निराळेपणा वाटला नाही.
उत्सवांप्रमाणे संकटांतसुद्धा!
गावात प्लेगचा धुमाकूळ चालू झाला. सारे गाव उठून गावाबाहेर मांडवात रहायला गेले. आमचाही मांडव तयार होता. पत्की कुटुंब अगोदरच गेले होते. संक्रांत उरकून मांडवात जाण्याचा आमचा बेत होता. पण योगायोग निराळाच ठरला. संक्रांतीच्या आधी एकच दिवस यडलांना ताप भरला तो प्लेगचा ठरला. संक्रांतीच्या सायंकाळी त्यांचा अंत झाला. घरात कल्लोळ उडाला. सखू, घारी गावातच असल्यामुळे सकाळी येऊन गेल्या होत्या. सायंकाळी कल्लोळ ऐकताच त्या प्रथम धावून आल्या. गावाबाहेर गेलेल्या मंडळींना बातमी लागल्याशिवाय पुढची व्यवस्था थोडीच होणार होती? गाव सारा ओसाड पडलेला. सखू लागलीच काळोखात गावाबाहेर दीड मैलावरच्या मांडवाच्या छावणीत एकटीच धावली. तिच्याबरोबर मामा भाऊ पत्की आणि मामेभाऊ शंकरराव ऊर्फ बाप्या आले. रात्री काही करता येणे शक्यच नसल्यामुळे भेटून गेले. सखू आणि घारी मात्र संबंध रात्रभर आमच्याबरोबर जागत बसल्या. अशी जिवंत जिव्हाळ्याची माणसे आजकालच्या जमान्यात कितीशी दिसतील?
गुळव्यांची उपपत्नी
श्रीमंत विठोबाअण्णा गुळव्यांना विवाहित पत्नीपासून एकच मुलगी झाली. ती आमच्या आत्मारामशेटची मातोश्री ती नाशिकनजीकच्या गंगापूर येथील आटवणे घराण्यातल्या महादाप्पाशेटना देऊन, त्यांना घरजावाई केले आणि आत्मारामशेटचा जन्म झाल्यावर, अर्थी इस्टेट त्या नातवाला बहाल केली. मात्र त्यांच्या रखेलीला एक राजबिंडा पुत्र झाला. त्यांचे नाव शंकरशेट शंकरशेट म्हणजे विठोबाची तंतोतंत प्रतिमा. मी त्यांना नुसते पाहिलेले आहे असे नव्हे, तर लहानपणापासून त्यांच्याकडे आलो गेलो आहे. अर्ध्या इस्टेटीची श्रीमंत शंकरशेटची पेढी नि तीनमजली हवेली आजही आटवण्यांच्या वाड्याला लागूनच असलेली दिसेल. शंकरशेटही रूप गुणसंपत्तीने आपल्या नामांकित वडिलांप्रमाणे दानधर्मात नि ग्रामसेवेत आघाडीला असत.
रखेल्यांच्या कन्या-पुत्रांच्या विवाहाचा प्रश्न तेव्हा काय नि केव्हाही काय, सहाजिकच मोठ्या त्रांगड्याचा एरवी जरी कोणी काही आक्षेप घेतले नाहीत, तरी मुलाला नवरी नि मुलीला नवरा मिळणार कसा आणि कोठून? शंकरशेटच्या विवाहाचा प्रश्न मात्र गावातल्या गावात सुटसुटीत सुटला गेला. प्रभूआळीत भोगकर गुप्ते यांच्या रखेलीची मुलगी काशी. पोर मोठी तरतरीत नाकीडोळी रेखीव. माझ्या आईच्या बरोबरच मुलींच्या शाळेत ती शिकायची. दोघींचीही नावे काशीच आणि दोघींही एकाच वर्षी मराठी सहावी यत्ता पास झालेल्या. विठोबाअण्णांनी त्या काशीला पसंत करून भोमकरांकडे शब्द टाकला. आणि शंकरशेट काशीचा विवाह बादशाही थाटाने पनवेलीत साजरा झाला.
सामान्य स्थितीतून अचानक असामान्य पदाला पोहचली, तरी काशी आपल्या आळकरी मैत्रिणींना कधीच विसरली नाही. गरिबांतल्या गरिबांकडे का हळदकुंकवाचे निमंत्रण असो. काशी अगत्याने त्या घरी जायची. शंकरशेटकडच्या वासंतिक आणि संक्रांतीच्या हळदकुंकवाला झाडून साऱ्या जमातींचा महिला वर्ग जायचा. साधारण दहा-पंधरा वर्षे सुखाचा संसार करून काशी भर तारुण्यातच दिवंगत झाली. मूलबाळ काही झाले नाही. त्यावर पुनर्लग्नाची काही स्थळे सांगून आली, पण "अंगठीतली आवडती हिरकणी गळाल्यावर, उगाच आता काचेचा खडा तिथं बसवायचाच कशाला?" म्हणून बरीच वर्षे शंकरशेट विधुरच राहिले. मृत्यूपूर्वी काही थोडे दिवस त्यांनी आजूबाजूच्या आग्रहाला मान तुकवण्यासाठी विवाह केला. पण तो त्यांच्याच भाकिताप्रमाणे काचेचा खडा ठरला. शंकरशेट नेहमी पुण्याला रहायचे. दिवाळीच्या वहीपूजनासाठी मात्र महिनाभर त्यांचा मुक्काम पनवेलीला असायचा. पेढीचे काम त्यांचा भाट्ये नावाचा दिवाणजी पहायचा.
धर्म करता कर्मच ओढवले
पंढरपूरची आषाढी यात्रा म्हणजे त्याकाळी एक प्राणान्ति दिव्यच असे. महापूर काय, घाणेरडे अन्न काय, सगळाच थाट. यात्रेबरोबरच पटकीचा आजार हमखास जबरदस्त चालू व्हायचा. हजारो यात्रेकरू बोल बोलता माश्यांमुंग्यांसारखे पटापट मरत असत.
त्या यात्रेकरू जनतेला अशा प्रसंगात आपण जातीने काही सहाय्य द्यावे. या उद्देशाने पटकीवरील औषधांचा भरपूर साठा आणि दोन डॉक्टर बरोबर घेऊन शंकरशेट पंढरपूरला गेले. म्युनिसिपालटीच्या सहकाराने तेथे केन्द्र चालू केले आणि पटकीने पछाडलेल्या रोग्यांची जातीने सेवा आरंभली. पण दुर्देव पहा, जो उदारधी पीडित जनतेच्या प्राणत्राणार्थ झगडायला सिद्ध झाला. त्याच्यावरच काळाने झडप घातली. पुण्यामुंबईच्या वृत्तपत्रांत ती बातमी येताच पनवेलीस हाहाकार उडाला.
प्रकरण ३
पत्की कुटुंबाचा वेलविस्तार
बाबांना तीन पुत्र आणि दोन कन्या मुलांची नावे (१) नारायण ऊर्फ भाऊ, (२) केशव ऊर्फ बापू आणि (३) अण्णा या ऊर्फ नावांनीच आम्ही सारे त्या मामांना हाका मारायचे. तिघांचेही मराठी शिक्षण सहावी पास आणि इंग्रजी तीन यत्ता. त्याकाळी हॉवर्डची तीन इंग्रेजी पुस्तके अभ्यासली की विद्यार्थी आजकालच्या पॅज्युएटलाही भारी होण्याइतक्या ज्ञानाचा मक्तेदार होत असे. इंग्रेजी पाचव्या यत्तेला तर पब्लिक सर्विस परीक्षाच मानली जात असे. ती पास झाली की सरकारी नोकरीचा हक्क शाबीत होत असे. ही एकच परीक्षा पास होऊन, सरकारी नोकरीत असताना हायर-लोअरच्या डिपार्टमेंटल दोन परीक्षा देणारी कितीतरी हुषार मंडळी अखेर हुजूर डेप्युटी कलेक्टरच्या रांगेत जाऊन पेन्शनीत गेली. इतके शिक्षण झाल्यावर बापूने आणि पाठोपाठ अण्णाने मुंबई गाठली.
सनलाइफमध्ये बापू चीफ अकौण्टंट आणि अण्णा स्मिदॅम बर्न सॉलिसिटरच्या फर्ममध्ये कोर्ट-क्लार्क म्हणून काम करीत होते. मुली (१) काशी ऊर्फ ताई (माझी मातोश्री) आणि (२) बाई (माझी मावशी), दोघीही मराठी सहावी यत्ता पास झालेल्या. बाईमावशी हमरापूरकर कुळकर्णी घराण्यात दिली. आमचा मावसा सरकारी तार खात्यात तारमास्तर म्हणून बरीच वर्षे अहमदाबाद येथेच राहिल्यामुळे, बाईमावशी अर्थातच गुजराथळलेली. थोरले मामा भाऊ यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगा शंकर ऊर्फ बाप्या आणि एकच मुलगी यमू, दुसऱ्या पत्नीपासून गजानन आणि भास्कर असे दोन मुलगे झाले. पैकी भास्कर चार-पाच वर्षांचा होऊन वारला. पनवेलची वकिली परंपरा सध्या शंकररावांचे चिरंजीव मधुसूदनराव आणि नातू आनंद चालवीत असतात. गजाननराव पत्की एक नामांकित शिक्षक म्हणून वसई हायस्कुलात शेकडो छात्रांच्या आठवणीत चिरंजीव आहेत. सध्या ते कलकत्त्याला आपल्या चिरंजिवांकडे असतात.
पत्रिका जुळली की जोडा ठरला
जुन्या जमान्यात वरवधूंच्या जोड्या निश्चित ठरविण्यात पत्रिकांचे बण्ड मोठे जबरदस्त असे. त्या जुळल्या की वरवधूंच्या आवडी-नावडीला कवडीचीही किंमत कोणी देत नसे. आजही ती रूढी अगदीच बंद पडली आहे असे नव्हे. चांगलेचांगले शिकले सवरलेले लोकही ऐन लग्नाच्या मोसमात पत्रिकांचा आग्रह धरताना दिसतात. बरे, या पत्रिका तरी अगदी शास्त्रशुद्ध तयार केलेल्या असतात थोडयाच? खेडेगावात तर विचारूच नका. मुलाची जन्मवेळ सांगताना, "आस्सं बगा भटजीबुवा, शेजारची सखू मोलकरीण पहाटेच्या दळणाला उठून जात्याला खुंटा ठोकीत होती. गावठणातले कोंबडे नुकतेच आरवत होते. इतक्यात आमची ही बाळंत झाली." एवढ्या खास बातमीवर भटजीबुवा पत्रिका बनवणार. जुन्या काळात घड्याळे बाळगण्याची फॅशन नव्हतीच.
येऊन जाऊन काळवेळ ठरवायची कशावर तर कासराभर सूर्य वर आला होता आणि शेजारच्या चिंचेची सावली आमच्या पडवीवर पडली होती. असल्या अनुमान धपक्यावर विशेष कसोटी सरकारी कचेरीत तासातासाला पडणाऱ्या टोल्यांवर. आणि हे टोले तरी कशावर आधारलेले? तर चिनी वाळूच्या डमरुवजा घडयाळावर. पहारेकऱ्यांचे लक्ष गेलेच तर तो टोले मारून घड्याळ उलटे करायचा आणि शेजारच्या दोरीवरील लाकडाचा गोटा डावीकडे सारायचा. पनवेलच्या सरकारी कचेरीतला ताशी गजराचा खाक्या चिनी वाळूच्या घड्याळावर चाललेला मी कितीतरी वर्षे पहात होतो.
पत्की-धोडपकर संबंध पत्रिकेने जुळवला
मराठी सहावी पास झाला की त्या तरुणाला मुली सांगून यायच्या. हुंड्यापाड्याबद्दल. सध्यासारखी त्याकाळी घिसघीस मुळीच नसे. घराणे कसे आहे नि मुलगा कसा आहे, या दोनच कसोट्यांवर लग्ने जुळायची. अर्थात पत्रिका मात्र जुळली पाहिजे हो. हुंडयाचा प्रघात नव्हता. मुलीचा बाप सुखवस्तू अथवा श्रीमंत असला तर तो आपली मुलगी इभ्रतदार गरिबाच्या मुलालाही साळंकृत (म्हणजे दागदागिन्यांसह सगळा खर्च करून) देत असे. बहुतेक दोन्ही घराणी आपापला खर्च करीत असत. चांगल्या दोनतीन वाऱ्या केल्यावर माझे वडील मराठी सहावी पास झाले. सहावी पास म्हणजे त्या काळचा ग्राज्बेट तेवढे शिक्षणही संसार व्यवहार करण्याइतपत खास उपयोगी पडत असे. सरकारी कारकुनी का असेना, पण तेथल्या उमेदवारीतही तो कधी कच्चा किंवा कामशिकावू आढळायचा नाही. आजच्या बी.ए. पदवीधरांना धड नोकरीचा अर्ज व्याकरणशुद्ध मराठीत अथवा इंग्रेजीत लिहिण्याची मारामार पडते.
पत्की घराण्याच्या तोलामोलाने पाहिले तर आमचे घराणे अगदी सामान्यांतले सामान्य, लक्ष्मीची नि आमची गाठभेट एकदाही चुकून एखाद्या वळणावर पडलेली नव्हती आणि बाबा पत्की वकील, अगदी श्रीमंत सदरातले नसले, तरी बड्याच्या गणतीतले. तथापि माझ्या तात्या आजोबांचा निर्भय, निरिच्छ आणि निस्पृह साधुत्वाचा लौकिकही काही कमी तोलामोलाचा गणला जात नसे. पत्रिका जुळली, तात्यांचा होकार मिळाला आणि सीताराम ऊर्फ बाळा ठाकरे आणि कुमारी काशी पत्की यांचा (लग्नातले नाव जानकी) विवाह थाटामाटात साजरा करण्यात आला.
हयातभर लोकसेवेचे व्रत
आमच्या घराण्यात प्रत्येकाने काहीना काही लोकसेवेचे व्रत घेऊन, हयातभर त्याची पाठपुरवणी केलेली आहे. माझी आजी, म्हणजे वडिलांची माता, हिने वयाच्या विसाव्या वर्षापासून मोफत प्रसूतिकार्य करण्याचे व्रत घेतले आणि ते तिच्या मृत्यूपर्यंत तब्बल साठ वर्षे अखंड चालविले. तिचे नाव सीता असले तरी घरादारात ती बय म्हणूनच ओळखली जात असे. "बय, बाई अडली आहे. चला" म्हणताच जेवणाचे ताट सारून ती चटकन जायची. मुलगा झाला तर नारळ नि साखरेची पुडी (पुडी म्हणजे खरोखरच चिमूटभरच साखरेची असायची) आणि मुलगी झाली तर नुसती साखरेची पुडी, यापेक्षा चुकून कधी कुणाकडून तांब्याचा छदामही घेतला नाही. हे कार्य ती धर्म मानून करायची आणि ते करीत असताना, जातपात, धर्मगोत, स्पृश्य-अस्पृश्य, हिंदु-मुसलमान असले भेद तिने मनात आणले नाहीत.
सुटकेची केस गावात असो, नजीकच्या दोनतीन मैलांवरच्या खेड्यातली असो, वाहनाची मागणी न करता, बोलवायला आला असेल त्यांच्या बरोबर चालायला लागायचे. सुटकेच्या कार्यात एकदाही तिला अपयश आल्याचा दाखला नाही. गावातले सिविल सर्जन अथवा इतर सुटका करणाऱ्या बायांच्या हातून एखादी केस निपटेनाशी झाल्यावर, तेही निर्वाणीचा उपाय म्हणून बयला बोलवायचे, बय गेली की सर्व काही सुरळीत व्हायचे. डॉक्टर किंवा धंदेवाईक बायांना पैसा द्यावा लागे, आणि बयचे काम धर्माचे नि मोफत, तेव्हा गावातल्या नि पंचक्रोशीतल्या बायांची मागणी हटकून बयकडेच यायची.
बरा लागेल मला नाट?
पनवेलच्या मुसलमान पोलीसपाटलाची बायको अडली होती. सर्जनचाही इलाज चालेना, बयला आमंत्रण आले. पण ती येण्यापूर्वीच बाई बाळंत होऊन मुलगा झाला. बयला पहाताच डाक्टर म्हणाले "बय. आज तुझा चान्स मी घेतला. बरं, आत जाऊन पहा सारं ठाकठीक आहे ना ते." बय आत गेली नि बाळंतिणीची तपासणी करून बाहेर आली. "हं. काय म्हणतोस रे डाक्टरसायबा, माझा चान्स गेला काय? आजवर नाही लागला मला नाट." जरा थांबा अर्धातास बय कधी रिकाम्या हाताने नाही परतली. बय आत गेली आणि थोड्याच वेळाने नाळाभरला दुसरा मुलगा हातांत घेऊनच बाहेर आली. "हा घ्या पाटलांचा दुसरा मुलगा. अरे बाबा डाक्टर, पहिली सुटका झाली म्हणून गेला असतास निघून, तर ही दुसरी भानगड रे कुणी निपटली असती?"
उठल्यासुटल्या सुरी काय वापरता?
पनवेलच्या लायनीत गणू ठाणगा म्हणून एक आगरी गृहस्थ होता. त्याची मुलगी अडली. तो बोलवायला आला तेव्हा बय दुसरीकडे गेलेली होती, म्हणून तो त्यावेळी गावात एक तरुण निष्णात सर्जन डॉ. टिपणीस होते, त्यांना घेऊन गेला. केस भलतीच अडचणीची. तोही विचारात पडला. बयला बोलवावी तर ती दुसरीकडे गेलेली. अखेरचा इलाज म्हणून त्याने शस्त्रक्रिया केली नि बाईची सुटका केली. मूल अर्थात कापले गेले. इतक्यात एक सुटका करून बय घरी आली. बोलवायला ठाणगा आला होता असे कळताच, ती तशीच तिकडे घावली, पहाते तो काय? रक्तपात! तिने डाक्टरची खूप हजेरी घेतली. "उठल्यासुटल्या सुरी काय चालवता?"
माणूसघाणेपणा बरा नाही
जीवनातला हा महामंत्र बयने आम्हा सर्वांना शिकवला. अस्पृश्यतेच्या रूढीबद्दल तर तिला मनस्वी तिटकारा असायचा. घरकामाला बाई असो बुवा असो, त्याची जातपात विचारायची नाही. असा दण्डक आमच्या घरात असे. आजही तो आम्ही कसोशीने पाळीत असतो. अस्पृश्यता-विध्वंसन काय किंवा हुंडा विध्वंसन काय, ज्या अनेक सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रात मी आंदोलने केली. त्याचे बाळकडू लहानपणीच बयने आम्हाला चाटविलेले आहे; तो काही पुस्तकी ज्ञानाचा परिणाम नव्हे. दिवाळीच्या बलिप्रतिपदेच्या दिवशी गावातल्या महार महिला स्वच्छ लुगडी नेसून नि झगमगीत पितळीमध्ये लामणदिवा लावून "इडापिडा टळो नि बळीचे राज्य येवो" ओरडत दारोदार दिवाळीचे पोस्त मागायला यायच्या. बहुतेक घरी दुरून त्यांच्या पितळीत आणा पैसा टाकून त्यांची बोळवण होत असे. पण आमच्या घरचा खाक्या न्यारा.
त्या बायांची हारळी ऐकू आली की ओटीवर झटझट कणारांगोळी काढून चार पाट मांडायचे. आम्ही चौघे भाऊ दिवाळीचा जामानिमा करून त्यावर बसायचे. त्या बाया अंगणात आल्या की त्यांना वर ओटीवर बोलवायच्या. त्या आम्हाला शिवून कुंकू लावायच्या नि लामणदिव्याची ओवाळणी करायच्या. आम्ही ओवाळणी टाकायचे. हा विधी दरसाल बिनचूक होत असे, शेजारीपाजारी नाके मुरडायचे, याबद्दल कुणी काही विचारायचे धाडस केलेच, तर "सणावाराच्या दिवशी कसला आलाय विटाळ नि चंडाळ. त्यांचा धंदा वाईट म्हणून त्या ओंगळ रहातात. म्हणून त्यांना शिवायचे नाही. एवढे ठीक आहे. मग घाणेरड्या रहाणीच्या ब्राह्मणालाही शिवू नये. त्यांचा धंदा वाईट म्हणून ती का वाईट? तीसुद्धा आपल्यासारखी माणसेच ना? सणावारी चांगले कपडे घालून आलेल्या त्या बायांना न शिवायला कसले आलेय पाप? आज तर त्यांचा मान असतो." असे उत्तर देऊन त्यांची तोंडे बय बंद करायची.
महाराच्या सावलीचा विटाळ
आणि ब्राह्मणाच्या? असेन त्यावेळी मी आठ-नऊ वर्षांचा. एका शनिवारी सकाळी दहाच्या सुमाराला शाळा सुटली नि मुलांच्या घोळक्यात मी घरी परत येत होतो. इतक्यात कामानिमित्त लांबडा झाडू घेऊन रस्त्याने जाणाऱ्या अन्या महाराची सावली माझ्यावर पडली. हे त्या मुलांनी पहाताच "अरे अरे, ठाकल्यावर महाराची सावली पडली, त्याला विटाळ झाला, त्याला कुणी शिवू नका, दूर व्हा पळा." असा सारखा ओरडा केला. अन्या महार तर केव्हाच निघून गेला, पण त्याच्या सावलीचे भूत मला चिकटले. मी एकटाच एका बाजूला आणि माझ्या मागे दहा-बारा शाळकरी पोरे "याला शिवू नका, विटाळ होईल" ओरडत चाललेली. ही विटाळाची मिरवणूक आमच्या अंगणात आली. विरुपाक्षाच्या विहिरीवर बय पाणी भरीत होती. धर्ममार्तण्डाच्या अवसानात नि धर्मऱ्हासाच्या तिरमिरीने मुलांनी तिला माझ्या विटाळाची कहाणी सांगून, "त्याला आंघोळ घाला, लवकर घाला, शिवू नका" असा एकच कोलाहल केला.
काही तरी भयंकर गुन्हा केला आहे, अशा भेदरलेल्या मनःस्थितीत पाटीदप्तर घेऊन मी उभा. बय प्रथम मोठ्याने हसली नि म्हणाली "महाराची सावली पडली म्हणून हा विटाळला. ब्राह्मण हा महारापेक्षा पवित्र फार मोठा सोवळा. खरं ना रे? (होय होय, मुलांचा (जबाब) मग आता त्याच्यावर ब्राह्मणाची सावली पाडली का महाराच्या सावलीचे पाप गेले. त्यासाठी आंघोळ रे कशाला? चटकन तिने अभ्यंकर नावाच्या मुलाचे मनगट धरले नि त्याला पुढे ओढून माझ्यावर त्याची सावली पाडली."
झालं काम, "महाराची सावली पडली तर माणूस महार होतो. आता ब्राह्मणाची सावली पडली म्हणून दादा आता ब्राह्मण झाला. कसला रे हा सावलासावलीचा पाणचटपणा? खातेऱ्यात लोळणाऱ्या गाढवाला खुशाल शिवता. तेव्हा नाही रे विटाळ होत? माणसाच्या सावलीचा विटाळ मानणं महापाप आहे. समजलात? चला जा घरोघर. आंघोळ नाही न बिंघोळ नाही. आचरटपणा सगळा. हेच शिकता वाटते शाळेत जाऊन?" मला तिने तसाच घरात नेला आणि असल्या मूर्खपणाच्या कल्पना टाकून देण्याची खरमरीत तंबी दिली. यानंतर अस्पृश्यांच्या सावलीचे भूत मी कधीच जुमानले नाही. मात्र त्यांना प्रत्यक्ष शिवावे का नाही. या मुद्याचा उलगडा होत नसे. तो पुढे चार-पाच वर्षांनी एका चिरस्मरणीय योगायोगाने झाला.
उद्धरेत् आत्मनात्मानम्
सन १८९८ च्या सुमाराला पनवेलच्या महारवाड्यात मेजर सुभेदार गंगारामजी नावाचे एक लष्करी पेन्शनर सहकुटुंब वसाहतीला आले. सुभेदारांनी महारवाड्यात एक टुमदार घर बांधले. त्यांचा तो खाकी ब्रीच ड्रेस, डोक्याला जरपट्टीचा खाकी शेमलेदार फेटा आणि घरच्या बायको मुलामुलींचा पोषाक इतका झकपक नि टापटिपीचा, की तितका गावातल्या एकाही ब्राह्मणब्राह्मणेतर पांढरपेशाचा किंवा मुसलमानाचाही नसे. हे सगळे कुटुंब रोज संध्याकाळी गावात बाजारहाट करायला किंवा फिरायला एकवट जायचे, तेव्हा सारे लहानथोर गावकरी त्यांच्याकडे कौतुकाने पहायचे. त्यांचा परीटघडी पेहराव, पैठण्या साड्या, दागदागिने नि एकंदर स्वच्छ रहाणी पाहून लोक आश्चर्य करायचे. सुभेदारांनी म्युनिसिपालिटीकडून महारवाड्यातले रस्ते सुधारून घेतले. महार मंडळींवर कदर ठेवून स्वच्छ रहाणीची त्यांना शिस्त लावली. पहाटे पाच वाजता ते स्वतः एक गजर वाजवायचे, तो कानी पडताच सगळा महारवाडा जागा व्हायचा. आधी महारवाडा झाडून साफ केल्याशिवाय गाव झाडायला जायचे नाही, हा दण्डक त्यांनी अंमलात आणला.
का म्हणून त्यांना दूर वागवायचे?
इतके सुधारलेले कुटुंब भाषा शुद्ध आचारविचार चांगले. बोलण्याची नि लोकांशी वागण्याची विनयशाली सभ्य धाटणी. पण ते केवळ जातीने महार, म्हणून लोक त्यांना शिवत नाहीत. त्यांची सावलीही घेत नाहीत. दूरदूर वागतात. ही रीत मला सारखी चीड आणायची. काय म्हणून आम्ही त्यांना असे वागवावे? एखाद्या आगरी किंवा कुणबी जातीच्या शाळासोबत्याच्या घरी मी गेलो तर त्यांच्या घरच्या मंडळींचे ते मळकट कपडे, तशीच ती रहाणी कोणीकडे आणि हे सुभेदारी कुटुंब कोणीकडे? यांच्याशी बोलाचालायला, त्यांच्या घरी जायला काय हरकत आहे? काय म्हणून गावातले चांगले शहाणेसुरते लोक यांच्याशी असे फटकून वागतात? खुद्द माझ्या मातुल आजोळी पत्की वकिलांकडे गंगाराम सुभेदाराला ओटीच्या खाली खुर्ची देऊन बसवीत आणि उंच जोत्याच्या ओटीवरून, लाकडी कठड्याच्या जाळीतून, माझे आजोबा, मामा त्यांच्याशी गप्पागोष्टी करीत. या वागणुकींचा मला फार राग यायचा. पण वडलांपुढे मी काय बोलणार नि करणार?
पुण्डलीक वरदा हाऽऽरि विठ्ठल!
हा तर भलताच प्रसंग ओढवला! काही दिवसांनी सुभेदारांना बेंच मॅजिस्ट्रेटचे अधिकार मिळाले. दर मंगळवारी सकाळी मामलतदार कचेरीत त्यांचे कोर्ट भरणार! बेंचावर महार मॅजिस्ट्रेट येणार या बातमीनेच पांढरपेशा कारकुनांचे धाबे दणाणले. दर मंगळवारी विनाकारण डबल आंघोळीचा प्रसंग! शिवाय कपड्यांचा साप्ताहिक बदल तरी किती करणार? नवा अंगरखा टोपी एकदा अंगावर चढली का वर्षानुवर्ष त्यांना पाणी लागायचे नाही. धोतराला रोज पाणी मिळायचे खरे, पण आता ते दोनदा. मंगळाची वक्रदृष्टीच ही! पहिल्या दिवशी सुभेदार कचेरीत गेले, तेव्हा टेबल खुर्चीच्या खाली मोठी सतरंजी पसरलेली होती. दुसऱ्या मंगळवारी कारकुनांनी ती काढली आणि मॅजिस्ट्रेटच्या हाती द्यायचे कागद ते अलगद दुरून टेबलावर टाकू लागले. या प्रकाराबद्दल साहजिकच सुभेदारांना चीड आली.
लष्करात आयुष्य घालविलेला माणूस तो. तेथे जातिभेद त्याला औषधालासुद्धा भेटलेला नव्हता. त्यांनी कलेक्टरकडे तक्रार केली नि लागलीच सगळ्या `ओबिडियण्ट सर्वण्टाना वरून खरमरीत कानपिचक्यांचा दट्ट्या आला. पण कारकून लोक कसले वस्ताद पोटासाठी नोकरी असली आणि पेशवाईबरोबर सगळे काही बुडालेले असले तरी ते धर्माला थोडेच बुडू देणार? कोट-मायनस फक्त धोतर सदरा-टोपी एवढ्याच जाम्यानिम्याने ते कोर्टात येऊ लागले. आंघोळ टळत नाहीच, तर कोट कशाला भिजवा? टोपीला विटाळ होत नसतो, असे शास्त्र रूढ होते. पण ते कोणत्या मनु-जनुने प्रसवले, याचा शोध मात्र अजूनही कोणी लावल्याचे ऐकिवात नाही. सुभेदारांनी स्वतःच फुलड्रेस चा हुकूम सोडून धर्म कारकुनांना अंग्रेजी मनुस्मृतीची धर्माज्ञा पाळायला भाग पाडले. अखेर बेंचोत्तर सचैल स्नानम् चा धर्म आचरणात आणल्याशिवाय कारकून शिपायांना गत्यंतरच उरले नाही.
आता येतो आहे काय त्यात एवढे?
हे स्नान सतरंजी प्रकरण गावात बरेच गाजले. या बाबतीत सुभेदारांच्या भावना काय असाव्या याचा अंदाज घेण्याची मला फार उत्कण्ठा लागली. यावेळी मी इंग्रेजी पाचवीत होतो आणि इंग्रेजी भाषा अस्खलित बोलत असे. (बटलरी इंग्लिश नव्हे, अगदी किंग्ज इंग्लिश). सुभेदारांची भेट कुठे नि कशी घ्यावी? एक दिवस ती संधी आली. गावाबाहेर लायनीच्या बाजूला शेतोडीत खजिन्यापर्यंत कधीमधी मी एकटाच फिरायला जात असे. एकदा तसा मी जायला नि सुभेदार कुटुंब महारवाडयातून बाहेर पडायला एकच गाठ पडली. मी थबकलो नि ते जवळ येताच "गुड इव्हनिंग सुभेदारसाहेब" म्हणून मी त्यांना सलाम केला. हसतमुखाने त्यांनी मलाही `गुड् इव्हनिंग` करून शेकहॅण्डसाठी हात पुढे केला. मीही झटकन त्या हाताचा सन्मान केला नि संभाषणाचा पहिला धागा पकडला, शेकहॅण्ड कसा नि का झाला.
यातल्या परस्पर आंतरिक भावनांची चिकित्सा होणार कशी त्या क्षणाला? दोघेही आम्ही परस्परांशी तन्मय होऊन बोलत चालू लागलो. फिरता फिरता अनेक गोष्टींवर चर्चा चिकित्सा झाली. सुभेदारणीनेही मधूनमधून आपल्या विचारांच्या चुटक्यांनी भाषणात रंग भरला. अस्पृश्यता नि धार्मिक मते यांवरच बरेचसे भाषण झाले. त्यांनी माझा नावपत्ता विचारताच, एकदम सुभेदार नि सुभेदारीण चमकल्यासारखे झाले नि म्हणाले -"म्हणजे? महिन्यापूर्वी आमच्या घराशेजारी एका महारणीची सुटका करायला आली होती त्या बयचे तुम्ही नातू वाटतं?" मी होय म्हणताच सुभेदारणीने बयच्या लोकसेवेवर स्तुतीचा फुलवरा चढवला आणि त्याच क्षणाला मी आणि ते सुभेदार घराणे जणू काय एकाच जीवाभावाचे झाल्याचा सगळ्यांना साक्षात्कार झालासे वाटले.
काळोख पसरू लागला. आम्ही गावाकडे परतू लागलो. गावाकडे वळताना, शेखण्ड करून सुभेदार म्हणाले "फार आनंद वाटला केशवराव आज तुमच्या संगतीत. भेटत जा. रामराम." सुभेदारणीला नि बरोबरच्या मुलामुलींना मी नमस्कार करीत असतानाच, सुभेदारीण म्हणाली "आमच्या घरी या की एकदा, असं म्हणायची आम्हाला सोय नाही. अन विचारलंच तसं तर तुम्ही थोडेच येणार?" या शेऱ्याने मी किंचित खजिल झालो. पण बेफाम वृत्तीने खाडकन उत्तर दिले- "का नाही येणार? आता येतो तुमच्या घरी. आहे काय त्यात एवढे? पण ही आहे माझ्या चहाची वेळ. द्याल मला तुम्ही चहा?"
आत्तापर्यंत मुग्ध असलेली सुभेदाराची सून हळूच म्हणाली "महाराच्या हातचा चहा तुम्ही कसा घ्याल? बाटाला ना? वाळीत टाकील जात तुमची." झक मारते जात नि पात. आज घेणारच मी तुमच्या घरी चहा, चला, "सुभेदारांच्या घरी जाऊन मी चहा घेतला आणि साडेआठाच्या सुमाराला घरी आलो. बराच वेळ लागल्यामुळे घरात अर्थात चौकशी झाली. मी सगळी हकिकत स्पष्ट सांगितली. आई, आजी, आजोबा यांना काहीतरी चमत्कारिक वाटेल आणि उद्या माझ्यावर गोमूत्रप्राशनाची शिक्षा बजावण्यात येईल, अशी मला धाकधूक वाटत होती. पण सारे ऐकल्यावर बय म्हणाली, "हा त्यात काय झालं? चहा सुभेदाराकडे घेतलास ना? एखाद्या अन्या महाराकडे तर नाही ना? यात रे कसलं आलंय पाप नि पुण्य? असलंच काही पाप, तर जाईल धुऊन श्रावणीच्यावेळी."
चहाचे बेंड गावात फुटले
सुभेदार आमच्याकडे नेहमी येऊ जाऊ लागले. ओटीवर या म्हणून बोलावले तरी "छे हो, अंगणच बरे, द्या मला इथं स्टूल, समाजाकडे दोघांनीही पाहिले पाहिजे. पनवेल म्हणजे मुंबई नव्हे." मीही त्यांच्याकडे वरचेवर जायचा नि चहा प्यायचा. काही दिवसांनी हे आमचे चहाचे बेंड गावात फुटले. जो तो चहासारखा उकळू लागला. तोंडावर उपरणे धरून, अगदी मयताच्या वेळदा चेहरा करून, वडील, आजा आजी, आई यांच्याजवळ जो तो निजी ती तक्रार करू लागले. ज्याचा त्याचा मारा "शोभतं का तुमच्या घराण्याला हे असलं?" याच मुद्यावर अखेर एक दिवस एक रंगेल ब्राह्मण वकील दोनतीन जातवाल्या प्रतिष्ठित प्रभू गृहस्थांसह आमच्या घरी मुद्दाम येऊन बयला भेटले.
आई असायची बयच्या मताची. आजोबा नि वडील कानावर हात ठेवणारे, अखेर अपीलकोर्ट म्हणजे काय ती बय. सगळा तक्रारीचा पाडा ऐकल्यावर ती म्हणाली, "अहो, ही नवीन पालवीची पोरं. वर्तमानपत्र वाचतात. तुम्हा आम्हाला कसची जुमानणार आता? शेण्डीघेरे छाटून चेहरे राखू लागली. उद्या मुंबईला गेली की मुसलमान इराण्याच्या टावरणातसुद्धा खातीलपितील. आपण किती आवरणार?" नंतर त्या रंगेल वकिलाकडे खोचक नजर टाकून बय पुढे म्हणाली, "अहो, कोल्हाटणीचे तमाशे करण्यापेक्षा नि दारवा झोकण्यापेक्षा सुभेदाराकडच्या चहात फारस पाप काहीच नाही. माणसानं माणसाच्या हातचा चहा प्यायला तर त्यात धर्म कसा बुडतो? चहाच्या कोपात बुडण्याइतका आपला धर्म म्हणजे काय टोलेगंडयाची कवडी आहे वाटतं? पाहीन मी सांगून दादाला (मला) ऐकलं तर बरं नाही तर करायच काय?" तिने मला काहीच समज दिली नाही. अखेर गावातली कुरबूर" `ठाकऱ्यांचं पोर बिघडलं` एवढ्याच सारांशात चहातल्या साखरेसारखी विरघळली.
केल्याने देशाटन
या सुप्रसिद्ध आर्येचे महत्त्व मला वयाच्या चवथ्या-पाचव्या वर्षापासूनच कळू लागले, याला कारण बयची (आजीची) प्रवास-लालसा. मी चार वर्षाचा झाल्यापासूनच ती मला बरोबर घेऊन एकटीच किती वेळा तरी बोटीने म्हणा. पडावाने म्हणा, मुंबईला आली गेली असेल, सांगता येत नाही. तिच्या पायावर भिंगरीच होती म्हणाना तो प्रवासही पार्सलाला अडकविलेल्या लेबलासारखा मुकाटतोंडी होत नसे. प्रवासात ती वाटेल त्याची ओळख काढायची आणि हवी ती सोय लावून घ्यायची, तोंड सारखे चाललेले. समोर भेटेल त्याच्याशी तिथे थोडेफार संभाषण व्हायचेच व्हायचे. मग तो सहप्रवासी असो किंवा बोटीचा कप्तान असो. त्यामुळे तिच्या ओळखीचे क्षेत्र विशाल असायचे.
उगाच का उतरत्या वयात दहा-पंधरा बायका आणि पाच-सहा पुरुष बरोबर घेऊन काशीयात्रेचा किचकट पल्ला तिने तडीला नेला? जो जसा भेटेल तशी त्याच्या भाषेत (मोडक्यातोडक्या का होईना) ती खुशाल बोलायची. काशीयात्रेमुळे तर ती हिंदी भाषा चांगलीच बोलायची. सन १८९२ साली ती, विनायक काका आणि मी इंदोर देवासच्या सफरीवर गेलो होतो. त्यावेळी तिची ही हिंदी भाषा आणि ओळखीपाळखी काढण्याचे तंत्र फार उपयोगी पडले. लहानपणच्या पनवेल-मुंबई फेरफटक्यामुळेच माझ्या स्मरणशक्तीचा उत्तम विकास होत गेला.
घराशी घोड्याचा टांगा आला की त्यात बसण्याची बालमनाची आतुरता मला अजूनही आठवते. टांगा बाजारपेठेतून जात असता, तेथील लोकांची गडबड, गाव सोडताना प्रथमच लागणारा तो लांबलचक कोळक्याचा पूल, सहा मैलांचा तो टांग्याचा प्रवास. वाटेत भेटणारी ती खेडवळांची रहदारी, त्यातल्या ओळखीच्या स्त्रीपुरुषांशी आजीचे नमस्कार व धावती संभाषणे, उलव्याच्या बोटीच्या धक्क्यावर जमलेला तो उतारूंचा नि टांग्यांचा जमाव लांबून बोटीचा कर्णा ऐकू येताच सगळ्यांच्या नजरा बोटीकडे वळायच्या. बोट येईपर्यंत धक्क्यावर वडाच्या झाडाखाली तो जन्मांध गणू न्हावी `अजि बोट चली गुलजार हाजि कासनकी` हे गाणे डफावर खड्या सुरात गात असायचा. त्याला लोक दिडकी नासरी टाकायचे, खाडीच्या वळणावळणाने पाण्याच्या खोलीचा अंदाज घेत घेत बोट धक्क्याकडे येत असताना देखावा फार सुंदर दिसायचा.
बोट धक्क्याला लावताना दोर फेकण्याची नि शिडी लावण्याची खलाशांची ती गडबड, पनवेलचे उतारू उतरत आहेत तोच मुंबईवाल्या पासिंजरांची सामानसुमान पोरा-बाळांसह बोटीत घुसण्याची धडपड, वगैरे देखावे माझ्या बालमनावर इतके खोल परिणाम करीत असत की त्यावेळीच दुनिया ही काहीतरी मौजेची आहे आणि जितके आपण फिरावे तितकी तिची निरनिराळी मौज आपल्याला पहायला मिळते, असे मला वाटे. इतिहास नि भूगोलाचे शिक्षण प्रवासाने फार सुलभ नि अस्सल मिळते. बोट सुटल्यावर मागे धक्क्याकडे वळून पाहिले की बोट पळत आहे का धक्काच पळत आहे, याचे मोठे कौतुक वाटायचे. पाण्यावर बोट चालते कशी हे दाखवण्यासाठी बय मला मुद्दाम कठड्यावर उंच उचलून धरून दाखवीत असे. वाफेने इंजिने चालतात कशी ते दाखवायची. उलवा सुटला की दुसरे बंदर न्हावाशेवा, तेथे पूर्वी हाजी कासम कंपनीची एक लहानशी तरती गोदी (ड्राय डॉक) असे.
भरतीच्या पाण्यावर बोट आत चढवून तिची या गोदीत रंगरंगोटी, रिपेरी चालायची. शेकडो कामगार उंदरासारखे बोटभर धावपळ करीत आहेत. झुरळासारखे परांच्यावर चढून रंगकाम घासकाम करीत आहेत हे पाहून मोठी मौज वाटायची मला. आता ही गोदी नाही. तिच्या पायाचे दगड मात्र लाटांच्या थपडा खात अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. मला वाटते मी मऱ्हाठी तिसऱ्या चौथ्या यत्तेत असतानाच (१८९५-९६) हो गोदी पाडली होती. पण सन १९१० सालापर्यंतच्या तरी कुलाबा जिल्ह्याचे वर्णन या भूगोलपत्रकी चोपड्यात न्हावेशेवे येथे एक तरती गोदी आहे हे पालुपदी वर्णन कायमच्या ठशाने मुद्रित होतच असे. यावर कुलाबा जिल्ह्याच्या शाळाखात्याच्या इन्स्पेक्टरला एक सणसणीत पत्र लिहून ही ढोबळ चूक सुधारण्याची मी विनंती केली (सन १९१४).
तेव्हा ही तरती गोदी वर्तमानकाळी क्रियापदाऐवजी भूतकाळी बुरखा घेऊन त्या पत्रकात वावरू लागली. उरणाच्या मोरे बंदरावरून येणारा तो लांबरुंद फताडा तराफा पासिंजरांची चढ-उतारांची गडबड ताडगोळ्यांनी नि बोरांनी भरलेले ते मोठमोठे हारे. तेथून निघाल्यावर मुंबई शहराचा लांबून दिसणारा तो मनोरम देखावा. तो राजाबाई टॉवर. भाऊच्या धक्क्यावरची हमालांची धांदल आणि रेकला ठरविण्याची लोकांची धामधूम (हा रेकला सन १९२०-२१ सालापर्यंत दादर माहीमलत्त्याला चालू असे. आताच्या पिढीला तो राणीच्या बागेतल्या अजबखान्यातच फक्त चित्ररूपाने कदाचित पहायला मिळेल.) रेकल्याला दोन बैल जोडलेले असत.
रेकला चालू झाला म्हणजे वाटोवाट धावणाऱ्या त्या घोड्यांच्या ट्रामगाड्या, घोड्यांच्या डोक्यांची ती पांढरी हॅटसारखी टोपी, गळ्यातल्या घंटेचा घणघण ठेकेबाज ध्वनी. ड्रायव्हरच्या शिट्या कारनाक पूल चढण्यासाठी झटकन येऊन ट्रामला चिकटणारा आणि पुलाच्या मध्यावर ट्राम येताच पटकन सुटून बाजूला सरणारा तो हंगामी धावता लठंभारती घोडा वगैरे देखावे बालमनाचे रंजन नि शिक्षण छान करीत. जाताना खांडवामार्गाने आणि परतताना रतलाममार्गाने देवास-इंदोरची सफर झाल्यामुळे विविध निसर्ग-दर्शनाचा बालमनावर झालेला परिणाम किती सांगावा?
सारांश, अगदी लहान वयातच मुलामुलींना प्रवासाची संधी नेहमी देत गेल्याने, जगाकडे पहाण्याचा त्यांचा ज्ञानचक्षू उघडतो. ठिकठिकाणचे निरनिराळे देखावे पाहून ते आठवणीच्या पेटीत जपून ठेवायला त्यांची स्मरणशक्ती जागरूक बनते. आपण पाहिलेल्या नवनव्या गोष्टी आपल्या सवंगड्यांना सांगण्यात त्यांना एक प्रकारचा अभिमान वाटतो, हुरूप येतो आणि त्यामुळे त्यांची भाषाशैलीही विकास पावू लागते. जी मुले आपला गाव सोडून कधीच कोठे बाहेर गेलेली नसतात, ती लहानपणापासून एकाच ठराविक साच्याच्या स्थितीत ठेवली जातात, ती बुद्धिविकासाच्या बाबतीत अगदीच बुरसलेली रहातात. स्मरणशक्तीने कमजोर होतात. यासाठी लहान मुलामुलींना नेहमी सफरा करण्याची संधी आईबापांनी निः शिक्षणसंस्थांनी अगत्य द्यावी, सफरांमुळे मिळणारे शिक्षण शाळेतल्या पुस्तकी शिक्षणापेक्षा कितीतरी पट हितकारक होत असते. आजकाल हा प्रकार चालू आहे. ही मोठ्या समाधानाची गोष्ट होय.
भाषणशैली कशी आकर्षक असावी
हे शिक्षणही मला बयपासूनच मिळाले. एखाद्या प्रवासाचे, दरोड्याचे, बंडाळीचे किंवा लहानमोठ्या घटनेचे शब्दचित्र ती काढू लागली की आजूबाजूच्या श्रोत्यांपुढे ती घटना हुबेहूब जशीच्या तशी, जणू काय आत्ताच घडत आहे, अशा शैलीने सांगायची. मग ते कथानक तासभराचे असो अथवा कितीही असो, ऐकणारे तन्मय होऊन ऐकत बसायचे.
भीती हा शब्दच तिला ठाव नव्हता. मला समजू लागल्यापासून तरी एखाद्या बिछान्यावर झोपलेली तिला मी कधीच पाहिली नाही. एखादी हातरी असली की तिचे काम भागत असे. फार काय, पण तशीच लहर लागली तर घराच्या पायऱ्यांवर खुरमुंडी घालून पार पडून असायची. मध्यंतरी कोणी "बय. इथं काय झोपलीस? घरात चल ना" म्हणाले की "अरे. मी इथं सहज बसले होते, लागला तितक्यात डोळा, झालं." हे बयचे उत्तर असे...
चोर पकडावा मोटे
एकदा आमच्या प्रभुआळीत भुरट्या चोरांचा सुळसुळाट उडाला. पोलिसांनी शिकस्त केली, पण थांगपत्ता लागेना, मध्यरात्र झाली की मागल्या दरवाजाची फळी किंचित उघडी ठेवून काळोखात बय टेहळणी करीत बसायची. खेडेगावात मागल्या दाराविषयी फार विचित्र कल्पना असायच्या. दिवेलागणीला "मागल दार लाया रे" च्या हाका स्वयंपाकघरापासून माजघर ओटीपर्यंत ऐकू यायच्या. याचे कारण एकतर मागल्या दाराकडे जंगली झाडपानांचे विस्तीर्ण आव्हाड असायचे, काळोखात ते सहाजिकच भयाण दिसायचे. त्यातच भूताखेतांच्या अनेक कल्पना, म्हणून दिवेलागणीला ते बंद करण्याचा प्रघात. एका रात्री दीडदोनच्या सुमाराला एक भुरटा चोर शेजारच्या घरात घुसताना दरवाजाच्या फटीतून बयने पाहिला.
सकाळी विहिरीवर ती पाणी भरीत होती. विहिरीला लागूनच शिवशंकर नावाचा जमादार बिऱ्हाडाला रहात असे. तो विहिरीवर आंघोळ करीत होता. इतक्यात रात्री बयने हेरलेला असामी खाके कसले तरी कपडयाचे गुंडाळे घेऊन रस्त्याने जाताना तिला दिसताच ती एकदम ओरडली - `ए शिवशंकर, धाव धाव त्या गण्याच्या मागे. लवकर धाव घेऊन ये त्याला जसा असेल तसा. इकडे बयचा शब्द म्हणजे फौजदारांपासून तो साध्या शिपायांपर्यंत हुकमेहुकूम मानला जायचा. शिवशंकर तसाच ओलेत्याने धावला नि त्याने गणूला हाक मारली. तो कसचा ऐकणार? पण शिवशंकर धावलाच त्याच्यामागे आणि आणला पकडून विहिरीजवळ बयच्या समोर "कसले रे गाठोडे आहे खाकेत तुझ्या गणू?" बयने विचारले. आणि लगेच "अरे ए भोळाशंकर, तोंडाकडे काय पहातोस? ये हिसकून नि पहा काय त्यात आहे ते." शिवशंकरने ते हिसकून पहाताच त्यात गणूने चोरलेली टिपणीस वकिलांच्या घरातली चांदीची भांडी सापडली. जवळच दौलतराम फौजदार ओटीवरून हे सर्व पहातच होते. गणूला पुढचे सारे पोलिसी सोहाळे भोगायला लागले, तितकेच नव्हे तर त्या भुरट्या टोळीतील सारे असामी उजेडात आले.
नेरे गावात श्रीमंत गोडबोल्यांच्या येथे लग्नाचा थाट चालला होता. अनेक नातलग जमले होते. अंगाखांद्यावर दागदागिने घालून बायका नेरे गावात चमकत होत्या. लग्नाचा थाट तो एकाकी रात्री बाराच्या सुमाराला तेथे दरोडा पडला आणि लूटमारीत हजारो रुपयांच्या दागदागिन्यांची लूट झाली.
रिकाम्या वेळी बयची बैठक फौजदारांकडे शेजारी फणश्यांच्या ओटीवर असायची. सगळ्या भानगडींच्या चर्चा चिकित्सा फौजदारांपाशी व्हायच्या. हा नित्यक्रम असे. सकाळी आठच्या सुमाराला दरोड्याची फिर्याद द्यायला गोडबोले तेथे आले. सगळी कर्मकथा सांगितली. ती ऐकल्यावर फौजदार बयला म्हणाले, "काय ग बय, कोण असतील हे दरोडेखोर?" अरे दादा, दुसरे कोण असणार? त्या राध्या कातोड्याला पकड, का झालं काम, "फौजदार पोलीसपार्टी घेऊन नेऱ्याला गेले आणि संध्याकाळच्या सुमाराला तो राध्या कातोडी, त्याचे साथीदार आणि लुटलेल्या दागिन्यांच्या पेट्या इतर सात आठ काठोड्यांच्या डोक्यावर देऊन परतले. फौजदारांनी लगेच बयला हाक मारली. तिला पहाताच राध्या तिच्या पायावर पडला.
बय म्हणाली, राध्या गाढवा, इथपर्यंत तुझी मजल गेली कारे आता? गरीब चांगला समजून तुला आजवर भाजी भाकरी देत आलो. पिलिगाच्या दिवसांत तुला पाहाऱ्याला ठेवून पगार दिला लोकांकडून, ही दरोडे घालण्याची अवदसा रे गाढवा कशी सुचली तुला?" राध्या कातकरी जमातीचा पुढारी. मोठा भयंकर, पण इमानी असे, त्याने चूक कबूल केली. क्षमा मागितली, फौजदाराला बय म्हणाली "हे पहा दादा, राध्याने गुन्हा चटकन कबूल केलाय आणि लुटलेला मालही परत मिळालाय. कायद्याने याला शिक्षा होणारच. पण तू खास शिफारस करून दोनचार महिन्यांच्या सण्टेसींवर याची सोडवणूक कर." त्याप्रमाणे सर्व काही झाले. तेव्हापासून राध्या गावात आला का आमच्या घरी यायचा. लाकूडफाटे तोडायचा. पडेल ते काम करायचा आणि पोटभर जेवून जायचा. कधीमधी दारूसाठी दोनचार आणे मागायचा. ते दिले की स्वारी खुष. तो इतरांपाशी टर्रेबाजी करायचा. दमदाटीही द्यायचा. पण बयपुढे आला का गोगलगाय. कुठे कुणाला त्याने दमदाटी केली का त्याची फिर्याद बयकडे यायची. ती त्याला बोलावून त्याची समजूत घालायची. मग सगळे आलबेल.
लोकप्रिय म्हातारी
सन १९१० साली मी दादरला बिऱ्हाड केल्यामुळे आमचे सारे कुटुंबच दादरकर बनले. थोडयाच दिवसांत येथेही दादर, माटुंगा, माहीम, वरळी भागांत बयची सेवा चालू झाली. अब्राह्मण कोळी, खिश्चन, मुसलमानादिकांच्या हाकेला ती धावून जायची. त्यामुळे तिच्या ओळखीपाळखीचे क्षेत्र विशाल झाले. म्हाताऱ्या आजीला ओळखत नाही, असा कोणीच नसायचा, बयने हाक मारली की हवा तो धावत यायचा नि तिचं पडेल ते काम करायचा. भाजीवाली, फूल-फळवाली, मासळीवाली कोणी का असेना, बय बाजारात गेली की तिथी बडदास्त आधी. बयशी भाव करायचा नाही. मागेल तो जिन्नस द्यायचा नि देईल ते पैसे घ्यायचे.
सार्वजनिक प्रेतयात्रा
सन १९१६त मिरांडाच्या चाळीत मी रहात असताना ऐंशीच्या वर्षी बयचा मृत्यू झाला. बातमी साहजिकच सगळीकडे गेली. प्रयाणाची तयारी चालली आहे तोच वरळीचे कोळी, माहीमचे ख्रिश्चन, मुसलमान यांशिवाय गावकरी ब्राह्मण प्रभू स्नेही मंडळी जमली. त्यांतली ख्रिश्चन, कोळी, मुसलमान मंडळी मला येऊन भेटली नि म्हणाली "हे पहा दादा, म्हातारीचे आमच्यावर फार फार उपकार झालेले आहेत. तुमची जशी ती आजी, तशी आमचीही आई-आजीच ती. आता आम्ही पडलो निराळया जातधर्माचे. पण आमची सगळ्यांची इच्छा आहे की म्हातारीला खांदा घालावा. एवढी आमची इच्छा तुम्ही पुरी करावी." बयच्या अभेदी विचाराच्या शागिर्दीतच आम्ही सारे वाढलेले. काकांनी नि मी तात्काळ होकार दिला आणि बयची प्रेतयात्रा अक्षरशः सार्वजनिक थाटाने दादरच्या सोनापुरात मिरवत नेण्यात आली.
वडलांचे स्वल्पविरामी जीवन
आमच्या ठाकरे घराण्यात माझे वडील बाबा हेच काय ते अल्पायुषी ठरले. जीवनाचे त्यांचेही एक व्रत होते आणि ते त्यांनी आमरण कसोशीने पाळले. ते म्हणजे कोठे आग लागली का ती विझवायला सगळ्यांच्या आघाडीला पाण्याची नळी घेऊन थेट आगीच्या डोंबाळ्यात घुसायचे. ओटीवर खुंटीला एक मोठा हातोडा टांगलेला असायचा. त्यांच्याशिवाय त्याला कोणी हात लावायचा नाही. आग लागल्याची बातमी कानावर पडली का जेवणाचे ताट सारून ते तडक तो हातोडा घेऊन धावा रे धावा. अमक्या ठिकाणी आग लागली, धावा असा ओरडा करीत बंबखान्याकडे धावत जायचे. पाठोपाठ साहजिकच आजूबाजूची मंडळी त्यांच्याभोवती गोळा व्हायची.
बंबखान्याच्या टाळ्यावर हातोड्याचा एक जबरदस्त टोला लगावून ते फोडायचे. लगेच तेथले नळाचे भेंडाळे वगैरे साहित्य बंबावर लावून तो बाहेर ओवून आगीच्या जागी खेचीत न्यायचा. "चला चला पाणी भरा. पाणी भरा" ओरडा होऊन बंबात पाणी भरत आहे तोच ही स्वारी धोतराची कास मारून, अंगावरचे कपडे दूर फेकून मोक्याच्या जागेवर थेट आगीच्या डोंबाळ्यात जाऊन उभी रहायची. प्रथम पहिला पाण्याचा जोस आपल्या अंगावर घेऊन चिंब व्हायचे आणि मग पाण्याचा मारा चालू करायचा. "सोडा सोडा, जोराने पाणी येऊ द्या" सारखे ओरडत असायचे, कित्येक प्रसंगी तर चोहोबाजूनी आग भडकली आहे आणि हा गृहस्थ पाण्याचा मारा करीत एखाद्या शिलकी आडव्या तुळईवर तोल संभाळून पाणी मारीत आहे, अशी अवस्था पाहून लोकांच्या गर्जना चालू व्हायच्या, "अरे बाहेर पड, मरशील" पण तिकडे लक्ष न देता ते आपले काम बेगुमानपणे करीतच रहायचे आणि मग आग आवाक्यात आल्यावर किंवा विझल्यावरच खाली उतरायचे. हयातीत त्यांनी किती आगी विझवल्या असतील, त्या सांगता येत नाही.
`बाळा ठाकरे म्युनिसिपालिटीच्या अधिकाऱ्यांना न कळवता बंबखाना फोडतो?` अशी तक्रार एकदा एका शहाण्याने केली. त्यावर मामलतदाराने कायम हुकूम सोडला की अशा प्रसंगी जे योग्य ते करायला प्रत्येक नागरिकाला हक्कच असतो.
पनवेलचा पाण्याचा दुष्काळ
पनवेलचे एक स्थायिक श्रीमंत रहिवाशी दिनशा माणिकजी पेटिट यांच्या पुढाकाराने गाढीनदीचे पात्र अडवून पनवेलला नळ येण्यापूर्वी, तेथे पाण्याचे फार हाल होत असत. उन्हाळ्यात सगळ्या विहिरी कोरड्या ठाक पडायच्या. सुकलेल्या वडाळा तळयात ठिकठिकाणी डोहोरे खणून त्यात झिरपणारे पाणी वाटीवाटीने हंडे घागरीत भरण्यासाठी लोक रात्ररात्रभर पहारे करायचे. अशा अवस्थेत कोठे आग लागली की भलताच प्रसंग! लोकांच्या नि भांड्यांच्या रांगा लांबलांबवर लावून, दूरदूरवरून पाणी आणून बंबाची रावणी तहान शमवावी लागत असे. त्या प्रसंगी गावकरी, शेट, व्यापारी भराभर आपले गल्ले बाहेर काढून आगीच्या जागी ठाण मांडून बसायचे. "चलो, चलो, एकाणा घागर, दोनाणा घागर" ओरडायचे आणि भराभर पाणी आणणाऱ्या लोकांना पैश्यांचा बटवडा करायचे. तसला माणुसकीचा जिव्हाळा सध्याच्या पट्टीस घे पावली जमान्यात दिसायचा नाही.
हरहुन्नरीपणाची दीक्षा
माणसाने एकमार्गी नसावे. अंगात हुन्नर पाहिजे. पडेल ते काम अंगमेहनतीने पार पाडण्याची शहामत पाहिजे. ही दीक्षा बाबांनी (वडिलांनी) आम्हाला दिली. ते उत्तम मूर्तिकार होते. घरातला गणपती ते स्वतः करायचे. पण तोही लहरीचा सौदा. एखादवर्षी बाहेरूनही आणायचे. पण एक गोष्ट मात्र अगत्याने करायचे. गणपतीसमोर कसला तरी कळसूत्री हालचालींचा देखावा दरसाल झालाच पाहिजे. त्याची कल्पना डोक्यात आली की लगेच धाकट्या भावाला (विनायकराव काकांना) "रजा घेऊन ये" चे पत्र जायचे. ते आले का मग घरात सुतारकी, लोहारकी, रंगघाटणी हरजिनसी कामे चालू व्हायची. आम्हा मुलांनाही कामाला जुंपायचे.
(१) खंडाळ्याच्या घाटाचा देखावा. बोगद्यातून आगगाडी येत आहे. सिग्नल वरखाली होत आहे. पाण्याचे धबधबे कोसळत आहेत. या देखाव्याची हालचाल करण्यासाठी दोऱ्या, तारा हुकमी ओढण्यासाठी आम्हा मुलांची आतल्या बाजूला योजना व्हायची.
(२) एका वर्षी पनवेलच्या कोर्टाचा देखावा तयार केला. वकील लोक हातवारे करून भांडताहेत, मुन्सफ साहेब होय नाहीची मान हालवीत आहेत. हा देखावा पहायला रंदेरिया मुन्सफ आले असताना, त्यांनी आपली केलेली एकाक्षाची नक्कल (ते एकाक्ष होते) पाहून ते खूप हसले आणि बाबांना दहा रुपयांचे बक्षिस दिले.
(३) एकदा कालिया मर्दनाचा देखावा केला. ओटीवर पुरुषभर खोल खड्डा खणला. चुनाविटांचा एक हौद आत बांधला. त्यात कालिया मर्दनाचा स्वतः तयार केलेला लाकडी हालचालीचा देखावा ठेवला. जमिनीपासून एक फूट खोलीवर जाड काच बसविली आणि त्यावर पाणी ओतले. आतला देखावा दिसावा, म्हणून चाळीस लाईन दिव्याची सहसा कोणाला न दिसेल अशी योजना केली. श्रीकृष्ण कालियाला धबके मारीत आहे आणि तो फडा हापटून विव्हळत आहे. या हालचालीचे कळसूत्र अर्थात आम्हा भावंडांच्या हाती आळीपाळीने असायचे. आमचा दीड दिवसाचा गणपती मोदकांचा नैवेद्य खाऊन `पुढच्या वर्षी लवकर या` चे निमंत्रण स्वीकारून गेला असला, तरी देखाव्याचे प्रदर्शन चांगले पंधरवडाभर चालूच असायचे. बयांची झुंड आली की घुसलो आम्ही गुप्त जागेत कळसूत्रे हालवायला. त्या पंधरवड्यात आम्हाला बाहेर भटकायची सोयच नसायची. बाहेरचे खेळबीळ बंद. सदा औताला जुंपलेले.
प्रकरण ४
नाटकांचा नि संगीताचा हव्यास
तो संगीत नाटकांचा जमाना होता. किर्लोस्कर देवलांची गद्य-पद्य नाटके अनेक कंपन्या गावोगाव गाजवीत होत्या. शाहूनगरवासी नि गणपतराव जोशी शेक्सपियरच्या नाटकांमुळे महाराष्ट्रात लोकप्रिय झाले होते. ती गद्य-पद्य नाटके गावकीच्या उत्सवांत करून, आपणही त्या धंदेवाल्या कंपन्यांपेक्षा काही कमी नव्हत, हे सिद्ध करण्यासाठी महाड, पेण, पनवेल येथे नाट्यशौकिनांचे कंपू तयार झाले होते. महाडकर कायस्थ प्रभू शौकिनांनी त्राटिकेचा उठावदार प्रयोग केल्याची बातमी आली, की पनवेलकरांना तसलाच एखादा प्रयोग करण्याची सुरसुरी यायची.
या ईर्ष्येमुळे अनेक नामांकित नट तयार व्हायचे. पनवेलचे बाबडया (सदाशिव) आणि केशव प्रधान बंधूनी तर आपल्या अचाट अभिनयकौशल्याने पुणे-मुंबई गाजवलेली. पनवेलकर शौकिनांचे ते अग्रणी आणि तालीममास्तर. देवलांच्या तालमीत वाढलेले नारायणराव पाटकर अधूनमधून मुंबईहून तालीम द्यायला यायचे. महाडकरांचे नाटयाग्रणी गोविंदराव टिपणीस. त्यांची भरारी फार मोठी त्यांचा महाडकर क्लब वरचेवर पुण्याला जाऊन त्राटिका, फाल्गुनराव, दुर्गा इत्यादी नाटकांचे जाहीर प्रयोग करून रसिकांकडून वाहवा मिळवीत असे. याच महाडकर क्लबचे पुढे `महाराष्ट्र नाटक मंडळी`त रूपांतर झाले.
महाडकरांवर आपण मात केली पाहिजे, ही पनवेलकरांची ईर्ष्या. महाडकर छापील नाटके करतात तर आपण न छापलेले नवीन एखादे नाटक स्टेजवर आणायचे, या हेतूने एकदा प्रिं. विष्णू मोरेश्वर महाजनी यांनी शेक्सपियरच्या `सिम्बेलाइन`चे भाषांतर केल्याची बातमी लागली. लगेच त्यांनी विनायकराव काकांना अकोल्यास पाठविले. पंधरा दिवसांत नाटकाची मोडी लिपीत नक्कल करून त्यांनी आणली. तालीम चालू झाली. महाजनींची सिम्बेलाईन तारा पनवेलकर रंगभूमीवर आणणार, हा सर्वत्र गवगवा झाला. गावकीचे नाटक नेहमी फुकटात असायचे. थेटराची भानगड नाही.
लक्ष्मीनारायणाच्या देवळाचा दर्शनी मोठा लाकडी कठडा उचकून काढायचा आणि जोत्याला लागून पुढे प्रशस्त रंगभूमीचा मंडप उभारायचा. या कामाचे विंजणेर ठाकरे बंधू (वडील नि चुलते). नाटकाची निमंत्रणे महाडकर पेणकर शौकिनांनाही जायची नि ते अगत्याने यायचे. सिम्बेलाइन तारा नाटकाचा (पुस्तक छापण्यापूर्वीच पनवेलला पहिला प्रयोग होणार, म्हणून प्रिं. महाजनींना मुद्दाम अकोल्याहून आणले होते. नाटक असले तरी संगीताच्या फोडणीशिवाय मजा कसली? म्हणून प्रत्येक गद्य नाटकाच्या प्रयोगाला कुठच्या तरी संगीत नाटकातला नांदी सूत्रधार नटीचा प्रवेश ठेवण्याचा पनवेलकरांचा रिवाज होता. होणारे नाटक कोणते, त्याचा लेखक कोण, हा तपशील नटी - सूत्रधाराच्या भाषणात नवीन घातला की काम भागत असे.
सिम्बेलाईन ताराचा प्रयोग उठावदार वठला. पनवेलकरांच्या नाट्यनिपुणतेची सगळीकडे वाहवा झाली. त्यानंतर या शौकिन मंडळींनी देवलांच्या दुर्गा या दुःखपर्यवसायी नाटकाचा प्रयोग, त्यांना मुद्दाम बोलावून, त्यांच्यासमोर केला. तोही छान वठला. स्त्री-शिक्षण नाटिकेच्या प्रयोगाने पुण्यात हाहाकार उडविणारे नाटककार नारायण बापूजी कानिटकर (बाळूकाकांचे वडील) यांचा नि बाबड्या प्रधानाचा परिचय निकटचा. त्या नाटिकेत त्यांनी चिमणीच्या दारुड्या नवऱ्याची भूमिका केलेली होती. कानिटकरांनी बाजी प्रभू देशपांडे हे गद्य नाटक लिहिल्याचे कळताच त्याचा पहिला प्रयोग आम्ही पनवेलला करणार, असा आग्रह धरून प्रधानानी परवानगी आणली.
रंगभूमीवर माझे पहिले पाऊल
नाटक बसविण्याचे ठरल्यावर लक्ष्मीनारायणाच्या देवळात नाट्य कंपूचा रात्रंदिवस धिंगाणा घालायचा. घरदारात संगीत नि भाषणे यांचा धुमाकूळ. मग वडलांचे पाऊल घरात ठरणार थोडेच? नोकरी संभाळून बाकीचा वेळ देवळात. भूमिकांच्या वाटणीत हे कधी पडायचे नाहीत आणि कोणी आग्रहही करायचे नाहीत, असलेच एखादे छोटेसे चार-पाच मिनिटांचे विनोदी काम, तर ते मात्र गळ्यात पडायचे. कारण पाठांतराचा नि यांचा उभा दावा, हा लौकिक सर्वश्रुत होता. रंगपट, कपडेपट आणि रंगभूमीची सजावट एवढे जबाबदारीचे काम मात्र त्यांच्याकडे दिले जायचे.
बाजीप्रभू नाटकात वडलांकडे शाहिराची भूमिका देण्यात आली. ती त्यांनी आवडीने पत्करली. एक मोठा पोवाडा गायचा होता आणि थोडेसे भाषणही होते. तालीममास्तर बावड्या प्रधानांनी विचारले "कायरे बाळा, एवढी तरी नक्कल चोख पाठ करशील का? का. आयत्यावेळी ठणाणा? उत्तर--"तोसुद्धा शाहिरी ठसक्यात करीन, समजलात?"
देवळात नाटकाची धामधूम चालू झाली की तालमीच्या वेळी मी हटकून रोज जाऊन बसायचा. नटांना भाषणे कशी शिकवतात, अभिनय कसा करावा नि तो का करावा, इत्यादी नाट्यशिक्षणाचे तपशील मी बारकाईने अभ्यासीत असे. वडील तर तालमीला बिनचूक गैरहजर, ते इतर हरकामांच्या उलाढालीत. कोणी विचारले की "अरे हे कसे चालणार? तर नक्कल माझ्या कडोसरीला आहे. ही पहा. तुम्ही काही काळजी करू नका. आमचं काम फरसकलास, देखते रहेना." शाहिराच्या तालमीची वेळ आली की प्रधान मला हाक मारायचे. "ए लेका, बापाचा पत्ता नाही. म्हण त्याचा पोवाडा तालमीत तू" मला रोज तालीम मिळू लागली. प्रत्येक शब्द स्वच्छ, स्पष्ट नि ठसक्यात कसा म्हणावा. मुद्राभिनय नि अंगविक्षेप कसे करावे, याचे मला आयतेच शिक्षण मिळाले.
अखेर व्हायचे तेच झाले. वडलांना तबला उत्तम वाजवता येत असे. नांदीच्या संगीताला तबला बडवून स्वारी रंगपट कपडेपटाच्या दलामलीत गर्क, इकडे शाहिराच्या प्रवेशाची वेळ येताच शोधाशोध चालू झाली. “नक्कलबिक्कल आहे का नाही पाठ?" प्रधानाने विचारले. यावर उत्तर काय? तर दादा (मी) कुठं बसलाय तिथनं आणा लवकर त्याला शोधून, तोयर मी रंगायला बसतो. "त्यावेळी असेन मी आठ-नऊ वर्षांचा. बसलो होतो पोरांच्या टोळक्यात. मला आत घेऊन गेले. आत जाताच, "काय रे पवाडा पाठ आहे ना तुझा?" मी होय म्हणताच मला झुबकेदार मिशा लावल्या, कपाळावर भला मोठा सफेदाचा टिळा लावला, गोंधळयाचा पोषाख, पगडी चढविली नि मला घेऊन स्वारी रंगभूमीवर आली. नट महाराजांचा नकलेचा एळकोट सर्वांना ठावा होता. बरोबर मलाही विलक्षण येषात बरोबर घेऊन आला आहे. तेव्हा काहीतरी हास्यस्फोटक छाटछूट नक्कल करून हा वेळ मारून नेणार, हे रंगभूमीवरील पात्रानी तेव्हाच ताडले. बाजीप्रभू नि काही सरदारांची ती बैठक होती.
बाजी : (कृष्णराव तुंगारे) काय शाहीर, बराच वेळ लागला यायला तुम्हाला?
शाहीर : अव, ती रांड लागना टॅव टॅव सुरावर खुंटी ताण ताण ताणली तवा आली वळणावर (तुणतुणेवाल्याला) ये तुनतुनीच्या, दे झटका तिला नि दाखव कशी ब्यास झारदार लावली हाय ती. (तो टणत्कार काढतो.) हा हंगऽऽ अश्शी!
एक सरदार : अन् हा कोण आणलाहेत बरोबर?
शाहीर ह्यो ह्यो? न्हाय वळाकलात? ह्यो माज्या बायलंचा प्वार हां कर रे ल्योका सुरुवात प्वाड्याला.
पेटीचे सूर चालू झाले. तुणतुणे झणत्कारू लागले. वडलांनी डफावर थाप मारून हलगीचे बोल काढले नि मी मुजऱ्याची झोकदार लयकारीत तान भिरकावून गायला सुरवात केली.
शिवाजी हायती लई रणसुर
प्रss त्ये शंभूचा अवतार
परगाट झालेत परथुमीवर
दुनिया व्हइल सुखी फार. जी जी जी.
पोवाडा चालला असताना, महत्त्वाच्या शब्दावर जोर देऊन, बाबा अंगविक्षेपासह किंचित गद्य प्रवचन करून सारखा रंग मरीत होते. आणि अखेर
कवन करी नारू शाहिर
पवाडा गातो दत्तु हंबिर,
या ओळी बाहेर पडताच "आल्याति आल्याति नारबा शाहीर बि हजीर हाईत. त्ये पगा बसल्याति खुर्चीवर पुनेरी आसनमांडी घालून हा खुलासा ढंगदार अंगविक्षेपांनी करताच, टाळ्यांचा नि हास्याचा कडकडाट उडाला नि खुद्द कानिटकरांनी `वन्समोअर`ची गर्जना केली. प्रवेश झक्क रंगला. आत गेल्यावर, काय? केली का नाही बहार?" विचारले. प्रधान म्हणाले- शहाण्या, दादाला तालीम दिली नसती मी, तर फज्जा उडवला असतास साऱ्या प्रवेशाचा, समजलास? "यावर हजरजबाब लेक काय नि बाप काय, रंग तर भरला ना?"
लागला- मेला
मुंबईत आणि नंतर तमाम महाराष्ट्रात ब्यूर्बोनिक प्लेगच्या साथीने कसला कहर उसळविला. त्याची सध्याच्या पिढीला फारशी कल्पनाच नसेल. पुष्कळांना ती माहिती अतिशयोक्तीचीही वाटण्याचा संभव आहे. जेथे जेथे प्लेग चालू झाला, तेथे तेथे "लागला मेला" याशिवाय दुसरा शब्दच ऐकू येत नसे. सकाळी लागला का संध्याकाळी गेलाच तो सोनापूर ओंकारेश्वराला! त्यातच ब्लॅक प्लेग नावाचा आणखी एक प्रकार होता. त्याने पछाडलेल्या रोग्याचे हातपायतोंड काळेठिक्कर पडायचे. लागणीपासून बेशुद्धावस्था तीतच तो मेला कधी हेही जवळपासच्याना उमगायचे नाही.
गावोगाव घराणीच्या घराणी दोन-तीन दिवसांच्या अवधीत खलास व्हायची. घरात दिवा लावायलाही कोणी शिल्लक उराया नाही पनवेलच्या दाईशेट कासाराचे कुटुंब चांगले तीस-चाळीस जणांचे नांदते-गाजते घराणे पाच-सहा करतेसवरते मुलगे, अनेक नातवंडे नि परतवंडे तांब्यापितळेची भांडी तयार करण्याचा कारखाना घणाघाई चाललेला त्यांच्या घरात प्लेग घुसला नि अवघ्या तीन दिवस ते वैराण झाले. घरात लहान-मोठ्या स्त्रीपुरुषांच्या मुलामुलीच्या प्रेतांच्या राशी पडल्या सर्वत्र हाच हाहाकार! त्या राशी उचलायच्या कशा नि कोणी? जो तो आपल्याच संकटात निः विवंचनेत म्युनिसिपालिटी तरी काय करणार? एका टोकाच्या महारवाडयापासून तो दुसऱ्या टोकाच्या कोळीवाड्यापर्यंत सारे लोक हवालदिल बरे. या रोगावर औषधी उपाय काय काही नाही. फक्त तो संसर्गजन्य आहे.
ही हाकाटी ठासून जो तो बोले सरकारला हाक मारावी. तर सरकार कोण? गावचा एकूलता एक विचारा मामलतदार त्याला वरचा हुकुम काय? तर एखादा लागला तर लगेच त्याला करांटीत (क्वारण्टाइनचा चलनी उच्चार) न्यायचा. करांटी काय थाटाची? तर इसरायली तळ्याच्या पटांगणावर बांबूच्या तट्या घातलेला एक विस्तीर्ण मांडव ना तेथे खाटा ना गाद्या. गोणपाटे पसरलेली त्यावर रोगी नेऊन टाकायचा. जगायचे असले तर जग, नाहीतर मर. मेला का त्याच्या घरी निरोप जायचा. तुमचा मयत ताबडतोब हलवा करांटीत दीड किंवा दोन डॉक्टर क्विनाइनच्या पाण्याची डबरी भरून ठेवलेली. पाजताहेत एकेका रोग्याला. तिथे कसली आली आहे शुश्रूषा नि देखरेख? कराटीत गेला तो खलास फक्त घरात मरायचा तो तिथे
स्पर्शजन्यत्वावर आगबाण उपाय
प्लेग स्पर्शजन्य रोग. तेव्हा ज्या घरात केस होईल तेथली मंडळी एकदम बाहेर काढायची म्युनिसिपालिटीचे लोक येऊन ते चुन्याने आतूनबाहेरून रंगवायचे. गंधकाची चुरी पेटवायची. पंपाने कसले तरी औषध घरभर उडवायचे आणि रोग्याच्या गादीगिर्दींबरोबरच घरातले संसाराचे सामान बाहेर काढून अंगणात जाळायचे. हा धडाका चालू झाला. प्लेग मामलतदार म्हणून एक जादा हापसर सरकारने नेमला कै. यशवंतराव महादेव रणदिवे यांची नेमणूक झाली. उलटमार्गे बोटीने आणि मुंबरा कर्जतमार्गे बैलगाडया टांग्यांनी येणाऱ्या लोकांवर सक्त मनाई बजावण्यात आली. आलेच तर त्याची डॉक्टरी परीक्षा घेऊन आत सोडायचे. संशयितांना आल्यामार्गे हुसकावून द्यायचे प्लेग मामलतदाराला मदत म्हणून जेन्नर आणि जोसेफ नावाची गोऱ्याकाळ्या कातडीची दोन ख्रिश्चन कारटी हापसर म्हणून आली.
पब्लिक वर्क्सच्या अिंजणेरी बंगल्यात त्यांचे बिऱ्हाड, रोज सकाळी मिलिटरीच्या दिमाखात यासपऱ्यास करीत ते दोघे आळी आळीतल्या घराघरातून बेधडक घुसायचे आणि कोणाला ताप आला आहे की काय, हे पाहण्यासाठी बेलाशक बायकांचेही हात पकडायचे. त्यांना हात गरमसा वाटला की "बस्स, चलो क्वारण्टाईनमे" असा दरडावून हुकूम सोडायचे नि पोलिसांना बोलवायचे. आमच्या घरात एकदा ते आले. मी समोर गेलो. त्यावेळी इंग्रेजी दुसरीत होतो. हॉर्डियन असल्यामुळे कामचलाऊ इंग्रेजी अस्खलित बोलत असे. जेन्नरने आम्हा मुलांची परीक्षा घेतल्यावर, त्याने ताईचा (मातोश्रीचा हात धरताच तिने दिली खाडकन त्याच्या मुस्कटात भडकावून.)
मीही चिडलो आणि धक्काबुक्की केली. साहेबाला मारले, असा एकदम बोभाटा झाला. यशवंतराव रणदिवे गावफिरती करून परत येत होते. आमच्या घराला लागूनच फणश्यांच्या घरात त्यांचे बिऱ्हाड होते. गोंगाट ऐकून ते धावतच आले. सगळा प्रकार पहाताच, त्यांनी त्या जेन्नर-जोसेफ जोडीला "गेटाऊट यू फूल्स" दरडावून घालवून लावले इतर गावकरीही गोळा झाले होते. त्यांनीही त्यांच्याविरुद्ध मनस्वी कागाळ्या केल्या. यशवंतरावांनी सणसणीत रिपोर्ट करून, त्यांची बदली करवली.
येथे एका मुद्याचा स्पष्ट खुलासा केला पाहिजे. पुण्यात काय किंवा पनवेलसारख्या गावात काय, प्लेग-बंदोबस्ताच्या सबबीखाली सरकारने ज्या गोऱ्या काळया सोजिरांच्या टोळ्या धाडल्या होत्या. ते सारे अर्कट ख्रिश्चनधर्मी असल्यामुळे, हिंदुधर्मीयांना मन मानेल तसे छळण्याचा सपाटा त्यांनी चालवला होता. तोंडात सारख्या शिव्या. घरात शिरले की माणसांना बेधडक धक्काबुक्की शिवीगाळ करायचे, भांडीकुंडी लाथांनी उडवायचे. यापेक्षाही विशेष म्हणजे ज्या घरात केस होई, तेथले सारे संसाराचे सामान, अगदी पाटयावरवंट्यासह अंगणात काढून त्यांची होळी करायचे का? तर म्हणे प्लेगचे जंतू त्यात असतील, ते जाळणे भाग आहे. या सर्व (बद) कर्मात त्यांचा हिंदुधर्मद्वेष रसरशीत दिसून यायचा. पनवेलला असले जाळपोळीचे तीनचार प्रकार आढळताच, रणदिवे मामलतदारांनी सरकारकडे कडाडून तक्रार केली आणि जेन्नर-जोसेफ या अर्कट ख्रिश्चन पोरट्यांच्या हुसकावणीबरोबर ते आगवाण उपाय बंद पडले.
वडलांनी स्वयंसेवकांची टोळी बनवली
स्वतःवर काही सांसारिक संकट आले की हातपाय गाळून बसायचा माझ्या वडलांचा स्वभाव, पण सार्वजनिक संकटांच्या वेळी कोण जाणे कसली अचानक हिंमत नि हुरूप त्यांना यायचा तो! त्याकाळी स्वयंसेवक हा शब्द नि ती संस्था जन्माला आलेली नव्हती. बाबांनी गावकीच्या संकटात उडी घेण्याचे ठरविले. "हे काय? गावात घरोघर प्रेतांच्या राशी पडल्या आहेत आणि आपण चांगले धडधाकट असताना, काय हातपाय जोडून स्वस्थ बसायचे? चला रे, आपण लागूया कामाला." अशी हाकाटी करून, त्यांनी दहाबारा स्नेही मंडळीचे एक पथक तयार केले. प्लेगमुळे शाळा. कोर्ट, कचेऱ्या सगळ्याच बंद. रामभाऊ पोज्जी, रामभाऊ डाक्टर, कृष्णराव तुंगारे, बाळा चिटणीस अशी स्नेही मंडळी लागली कामाला. त्यांना काही ब्राह्मण तरुणांनीही साथ दिली.
ज्या घरात मयत झाले, मग ते कोणाचेही असो, जातपातच काय, पण धर्मबिर्मसुद्धा मानायचे नाही, तेथील प्रेते उचलण्याच्या नि पुढील विल्हेवाट लावण्याच्या कामाला ही मंडळी रात्रंदिवस खपू श्रमू लागली. एकेका दिवसात पंधरा-पंधरा वीस-वीस प्रेतांची विल्हेवाट लावू लागली. अनेक ठिकाणी घराबाहेर प्रेत काढणे, महान संकट असे. तेथे निर्ढावलेल्या इसमालासुद्धा माघार घ्यावी लागायची. जेवण नाही, खाण नाही, कपाळाचा घाम पुसायला फुरसत नाही. एकेका तिरडीवर दोन-दोन, तीन-तीन प्रेते रचून यात्रा निघायची. हवा कुंद झालेली. घरोघर रड्याओरड्याच्या किंकाळ्या ऐकू यायच्या, गावाबाहेर खजिन्यांच्या बाजूला मांडवात रहायला गेले, तरी समोर पाच-सहा फर्लांगावरच्या धबाबरी मसणवटीत जळत असलेल्या प्रेतांच्या होळयांचा उजेड मांडवावर रात्री चमकायचा. आम्हा पोरांच्या मनात विलक्षण धाकधूक उडायची. दिवसातून एक वेळ तरी बाबा घरी किंवा मांडवात दोन घास खायला अथवा किंचित हाराहुश् करायला आल्याचे सहसा दिसायचेच नाहीत.
अर्कप्राशनाची समयोचित आवश्यकता
यशवंतराव रणदिवे जातीने त्या स्वयंसेवकांबरोबर प्रेतवाहनाच्या कामाला हातभार लावायचे. प्लेग हा मनस्वी स्पर्शजन्य रोग असल्यामुळे, प्रेते उचलणे, त्यांची विल्हेवाट लावणे, आजारी माणसाच्या शेजारी सोबतीच्या दिवसरात्र पाळ्या करणे, ही कामे नुसत्या धाडसाने होत नसतात. घरात घुसून प्रेत बाहेर काढताना तर कित्येकांना अवसानघात होऊन, त्यांना घेरी यायची. असल्या कामांसाठी माणसाला कसला तरी कैफ करणेच आवश्यक असते. हे मर्म अखेर यशवंतराव रणदिव्यांनी हेरले. स्वतःच्या बऱ्यावाईटाची दिक्कत न बाळगता, हे स्वयंसेवक जिवापाड श्रमसाहसाची कामे किती हिरिरीने करतात, हे त्यांनी जातीने अनुभवले असल्यामुळे त्यांनी लायनीतल्या मामा पिठेवाल्याला सरकारी हुकूम दिला, की ही मंडळी पितील तितके त्यांना पाजीत जा आणि महिनाअखेर बिल सरकारवाड्यात पाठवीत जा. एवढा बंदोबस्त होताच, ती मंडळी बेगुमानपणे दिवसारात्री पडेल त्या भयंकर मुकाबल्याचा फडशा पाडायला लवमात्रही डगमगेनाशी झाली. अर्कप्राशनाने एरवीचे श्रमदूत यमदूतांची कामे करू लागले आणि तसल्याच धर्तीच्या धडाडीची त्या सार्वजनिक महान संकटाच्या काळात जरूर होती नि असतेही.
स्वानुभवाचा एक दाखला
स्पर्शजन्य रोगांच्या साथीत अर्काची म्हणजे दारूची आवश्यकता किती असते, याचा निर्णय मला मुंबईच्या एका नामांकित डॉक्टरानेच पटवून दिला (१९१३) अलिकडे जरा मला फ्ल्यूचा अटॅक आला होता असे म्हणण्याची एक संभावित फॅशन पडलेली आहे. पण मुंबईत प्रथम जेव्हा इन्फ्ल्यूएंझाची साथ बोकाळली, तेव्हा ही फॅशनेबल भाषा बोलायची एकाचीही हिंमत होत नसे. त्यावेळीही `लागला मेला` हेच सगळीकडे ऐकू येत असे. सन १९१८ सालच्या इन्फ्ल्यूएंझाच्या साथीने मुंबईत उडविलेला प्रलय, प्लेगाइतकाच भयंकर होता. मुंबईची रोजची मृत्युसंख्या वाढत वाढत दीड हजारावर गेली होती. रोजच्या वर्तमानपत्रांत लोक प्रथम हा आकडा बघायचे. गवालिया टँकवर रहाणारा एक म्हातारा पारशी हापिसात जायला निघाला होता. त्याने नानाचौकात एक वृत्तपत्र विकत घेतले आणि मृत्यूचा आकडा १,८०० वाचताच, ताडकन हार्टफेल होऊन रस्त्यावर कोसळला. हे आकडे प्रसिद्ध न करण्याचा सरकारी हुकूम जारी झाला.
इन्फ्ल्यूएंझावर उपाय काय? तर जवळजवळ काहीच नाही. त्यावेळचे नामांकितांतले नामांकित डॉक्टर राव हे म्हणे रोग्यांचे स्प्रूटम का फ्रूटम् तपाशीत आहेत. लवकरच ते रामबाण उपाय जाहीर करणार आहेत. एवढेच जो तो बोलायचा. गज्जर कंपनीने एक पाढऱ्या रंगाच्या बरबटाच्या बाटल्या काढल्या होत्या. स्थानिक सेवा मंडळाने त्या घरोघर फुकट वाटण्याचा क्रम ठेवला होता.
याच साथीत माझी आई वारली आणि बायको नि तीन लहान मुलींच्या लोथी पडल्या. काय करावे सुचेना. तसाच उठलो नि वांद्र्याला डॉक्टर डिमॉण्टींना जाऊन भेटलो.
डॉ. तमे पितेबिते काय मिस्टर?
मी प्रसंगोपात पिते.
डॉ. अरे मंग एक `एक्शा नंबर वन्` ची बरांडीची बोतल ठेवा आणूनशी घरामंदी, अने थ्री टाइम्स ए डे पेशण्टला देत जा थोडाथोडा. से हाफ पेग, जसा एज असेल तसा. खायला कायची नको दे, वॉटर सफिशष्ट प्येल तेवढा पिऊ दे. सम्दा ठीक होईल. बरांडीमंदी डिजिटॅलिस असते. ते हार्टला सस्टेन करते. ए रोगमंदी हार्ट सेफ अॅण्ड साऊण्ड ठेवला पाह्यजे.
मी तो उपचार चालू केला आणि तिघेही रोगी तीन-चार दिवसांत साफ बरे झाले. अनेकांना मी तो उपचार सांगितला. अपघाताने बेशुद्ध पडलेल्याला प्रथमोपचार म्हणून ब्रॅण्डीचा घोट पाजला, की तो शुद्धीवर येतो, त्याची हृदयाची धडपड (पैल्पिटेशन) थांबते, हा डॉक्टरी अनुभव आहे. सध्याच्या पिसाठी राजकारणी जमान्यात केवळ भूतदयेने एवढेही करता येणे शक्य नाही. अर्काच्या व्यसनाची कोणीच तारीफ करीत नाही नि करणार नाही. पण आवश्यक औषधोपचारासाठी डॉक्टरांनाही हे साधन सहज सुलभतेने उपलब्ध होऊ नये, हे काँग्रेजी राजकारणी पिसाट अमानुष नव्हे काय?
दुर्दम्य महत्त्वाकांक्षेची मातोश्री
आज आम्ही ठाकरे ज्या सामाजिक, बौद्धिक नि सार्वजनिक पातळीवर आहोत त्याचे सारे श्रेय आमच्या मातोश्रीच्या कर्तबगार नि कडकडीत शिस्तीला आहे. आम्ही तिला ताई म्हणायचे आणि सारे पनवेल गावही याच नावाने तिला हाक मारायचे. सुखवस्तू बाबा पत्की वकिलांची ती मुलगी. धाकटी बहीण इंग्रेजी शिकलेल्या कुलकर्ण्याला दिली, कां? तर पत्रिका जुळली आणि ताईला? जेमतेम सहावी यत्ता पास झालेल्या तरुणाला दावे बांधून दिली. का? तर पत्रिका जुळली. ताईच्या दुर्दम्य महत्त्वाकांक्षेच्या मुळाशी या विकल्पाचे कारण खास असले पाहिजे. सासरच्या घराण्याला श्रीमंती नसली, तरी सासूसासऱ्याची साधुत्वाची कीर्ती आणि लोकसेवेची पुण्याई धनत्तर.
एवढ्या भांडवलावर तिने आत्मोत्कर्षाची निश्चित रूपरेषा मनाशी आखली असावी. तिचा स्वभाव अतिशय मानी असे. त्याचा रोख राखण्यासाठी ती कुणाचीही पर्वा करायची नाही. खोट्याची दंभाची अहंलेची नि कोरड्याची फुशारकी तिला मनस्वी चीड यायची. इतकी की ती आम्हा मुलांना तर झोडपून काढायचीच, पण भररस्त्यात हवी त्याची ठणकावून छेड काढायची, मग तो कोणी का राव रंक असेना, त्याचा मुलाहिजा राखायची नाही. आम्ही आमच्या वाटेने जात असतो, आमच्या व्यवहारात इतरांना तोंड घालण्याची जरूर नाही, हे तिथे सांसारिक पिनल कोड असे. संसार गरिबीचा होता. तरी गरजेसाठी तोंड वेंगाडलेले तिला आवडत नसे.
असेल ती मीठभाकरी गोड करून खावी. जेवताना हे बरे नि ते वाईट, असे बोलण्याची घरात कुणालाही मुभा नसे. मागाहून खुशाल चर्चा करावी. अन्न हे परब्रह्म आहे. जगातल्या साऱ्या उलाढाल्या त्यांच्यासाठीच चाललेल्या असतात. ते मुकाटतोंडी शांतपणाने खात जावे, असा तिचा दण्डक असे. माहेरचा संबंध जितक्यास तितकाच ठेवलेला. त्यांचाही उणादुणा शब्द ती ऐकून घ्यायची नाही. लागलेच कडाडून प्रत्त्युत्तर व्हायचे. घरातली शिस्त सगळ्यांना पाळावी लागत असे. जिथली वस्तू तिथे ठेवलीच पाहिजे. जर इकडच्यातिकडे झाली की बिजलीच्या कडकडाटाने सारे घर दणाणून जायचे.
आम्हा मुलांच्या वागणुकीवर आणि अभ्यासावर तिची करडी नजर असे. रात्री आम्ही झोपल्यावर ती आम्हा सर्व भावंडांच्या पुस्तकांच्या धोपट्या तपासायची. त्यांत काही आक्षेपार्ह सापडले की सकाळी चहाच्या वेळी भरलीच आमची कंबक्ती. अंगरख्याच्या खिशात दिडकी ढब्बू सापडला तर कुठून आणलास? या सवालाचे समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत चहा जेवण बंद. मुलांचे खाण्यापिण्याचे, कपड्यालत्त्याचे लाड, इतर बाबतीतला वाह्यातपणा नि अभ्यासाची हेळसांड मला नाही सहन होणार, असा तिचा जागताज्योत दरारा होता. पुस्तकातली छापील चित्रे लालनिळ्या पेन्सिलीने रंगविण्याची पुष्कळ मुलांना सवय असते. ताईला हा छंद खपायचा नाही. आज चित्र रंगविलं आहेस. एक वेळ माफ करते. पण पुढच्या खेपेला तोंड रंगवीन, याद राखून ठेव. अशी कडकडीत नि खरपूस ताकीद मिळायची.
उद्यां तुला असा जाळीन
देवाळ्या तळयावर करमल्लीशहाच्या दर्ग्याजवळ दरसाल मोठा उरूस भरत असतो. नाना प्रकारच्या जिनसांची शेकडो दुकाने थाटली जातात. त्यात काही पुस्तक-विक्यांची दुकाने असत, ते सोडतीने पुस्तके विकायचे. एका झोळीत खूपशा चिठ्ठया. बहुतेक हमखास कोऱ्या असायच्या. दिडकी दिडकी. कोईबि किताब उठाव असे ते दुकानदार ओरडत असायचे. पुस्तके कसली? तर मामा मामींचा झगडा, छेलबटाऊ मोहना राणी, ढेरपोट्याचा फार्स, असली. शाळकरू पोरांनी दिडकी द्यायची, झोळीत हात घालून चिठ्ठी बाहेर काढायची, त्यावर पुस्तकाचे नाव असले तर लगेच ते पुस्तक मिळायचे. पण बहुतेक दिडक्या कोऱ्या चिठ्यांवरच फुकट जायच्या पुस्तक असायचे वीसतीस पानांचे. वर एखादे बाईचे चित्र आणि किंमत छापलेली किती? एक रुपया, दोन रुपये. अशी. दिडकीत एवढ्या किंमतीचे पुस्तक मिळते, हेच मुलांचे मोठे आकर्षण.
चिट्ट्यांवर पुस्तकाचे नाव लिहिणारे शहाणे ते दुकानदार सिसपेनसिलीने दाबून नावे लिहायचे. पातळ कागद. अर्थात किंचित तो खडबडीत व्हायचा. दिडकी देऊन मी झोळीत हात घालायचा नि तसली खडबडीत चिठ्ठी बोटांना लागली का बाहेर काढायचा. मला बिनचूक पुस्तक मिळायचे. असे दोनचार वेळा झाल्यावर पोरांनी कयास बांधला की ठाकऱ्याच्या हाताला यश आहे. आपल्यासाठी ते मला दिडक्या द्यायचे नि पुस्तक मिळाले की मी ते त्यांना द्यायचा. दुकानदारही चमकायचा. हा पोरटा हात घालतो नि नेमकी नावाची चिठ्ठी काढतो. बराच वेळ झोळीत मी चाळवाचाळ करू लागलो, की "अरे चल लवकर हात बाहेर काढ" म्हणून तो ओरडायचा. मी काय त्याला दाद देणार? दर दिडकीला कसले तरी पुस्तक मिळू लागलेले पाहून, सोडत बंद, चलेजाव" म्हणून झोळी बाजूला ठेवायचा. आम्ही गेलो की पुन्हा करायचा सुरुवात.
अशाच एका सोडतीत मला एक पुस्तक मिळाले. जाडजूड, वर सुंदर चित्र, बांधणी आकर्षक किंमत २ रुपये. नाव काय? सुंदर स्त्रियांची सुंदर कहाणी, पुस्तक खरोखरीच अश्लील नि नादान मजकुराचे छान जाड पुस्तक मिळाले. एवढाच आनंद, पुस्तक मी धोपटीत ठेवले नि झोपी गेलो. रात्री ताईचा तपासणी फेरा आला. तिने ते वाचले नि ठेवले एका बाजूला काढून सकाळी चहाच्या वेळी सगळ्यांना चहा मिळाला. मला? "नाही मिळणार आज तुला चहा जेवण" अशी दरडावणी मिळाली. "का नाही मिळणार?" मी विचारता ती तरतरा उठली ते पुस्तक घेऊन चुलीपाशी आली. "ही असली घाणेरडी कादंबऱ्यांची पुस्तके वाचतोस काय? भीक मागायची आहे वाटतं पुढे? हे पाह्यलंस, ही कादंबरी मी अश्शी आज चुलीत जाळते. (तसे केल्यावर) उद्या असलं पुस्तक हातात धरलंस तर तुलाही असाच वहिलात जाळीन समजलास?" असा सज्जड दम भरला. त्या दिवसापासून कादंबरी शब्दाविषयी आणि सामान्यतः कादंबरी साहित्याविषयी मला जो तिटकारा बसला, तो आजदिनतागायत कायम आहे. मी कादंबऱ्या वाचीतच नाही.
दररोज एक तास वाचन
सायंकाळी शाळा सुटल्यावर दररोज ताईने आणलेली वर्तमानपत्रे मोठ्याने वाचावी लागत. वाचताना शब्दोच्चार कसे होताहेत, मजकुरातील विषयाप्रमाणे आवाजाचे आरोहावरोह ठीक होतात की नाहीत. इकडे तिचे फार बारकाव्याचे लक्ष असायचे. नाटकेही ती वाचून घ्यायची. त्यात विष्कंभक शब्द आला. तो वाचताना मी भलताच उच्चार करताच डाव्या गालावर थाडकन आवाज झाला. कठीण शब्दाचे अर्थ ती मधून मधून सांगायची. एका दिवशी तिने हरिभाऊंची `पण लक्षात कोण घेतो?` ही कादंबरी आणली. "दादा, वाच पाहू ही कादंबरी?" मी काय कादंबरी? मी नाही वाचणार ताई "अरे ही कादंबरी तशी नाही. मी वाचली आहे. फार छान आहे. आपण शिकण्यासारखं पुष्कळ आहे तीत. वाच. सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यास हा प्रसंग कारणीभूत झाला.
दुसऱ्या यत्तेत वजाबाकी बेरीज शिकायची होती. माझ्या वर्गाला जोशी नावाचे मास्तर होते. त्यांनी आम्हा मुलांना घरून गोट्या विकत घेण्यासाठी दोनदोन आणे आणायला सांगितले. ताईजवळ पैसे मागितले. कशाला, तेही सांगितले. ती म्हणाली, "बरं, तू जा शाळेत, मी येत्ये पैसे घेऊन." थोड्याच वेळात ती शाळेत आली. ताई शाळेच्या बाजूस येताच हेडमास्तरांसकट सगळ्यांना धाकधूक वाटायची. काहीतरी तशीच भानगड असल्याशिवाय ती इकडे फिरकायची नाही आणि ज्याची काही चूक असेल त्याची खरडपट्टी काढल्याशिवाय रहायची नाही हे गावकऱ्यांना माहीत होते. हेडमास्तर उपाध्यांनी तिला ओटीवर गाठले.
त्यांना पाहाताच ताई गरजली- "काय, उपाध्ये मास्तर, आता काय पोरांना गल्लोगल्ली टब्बू खेळायला शिकवणार आहात वाटतं?" उपाध्ये- "म्हंजे काय? मी समजलो नाही ताई. "त्या तुमच्या जळक्या (जोशी मास्तरला ताई जळक्या म्हणायची) मास्तरने प्रत्येक मुलाला घरून गोट्यांसाठी दोनदोन आणे आणायला सांगितलेत ते कशाला?" ताईला बरोबर घेऊन उपाध्ये आमच्या वर्गात आले नि जोश्यांना खुलासा विचारला. वजाबाकी बेरीज शिकवण्यासाठी, असे ते म्हणताच ताई कडाडली, "का, तुमच्या शाळेत रंगीत गोट्यांच्या फळ्यांचा दुष्काळ पडला की काय? पोरांच्या हाताला एकदा गोटी लागली का झालीच त्यांच्या अभ्यासाची गारगोटी." उपाध्यांनीही जोशी मास्तरला दम भरला नि सगळ्या पोरांनी आणलेले पैसे जागच्याजागी परत द्यायला लावले. पत्ते खेळण्याच्या बाबतीतही, "पुन्हा तुझ्या हातात पत्ते दिसले तर लाल कालथ्याचा डाग देईन हाताला" असा तिने दम भरल्यामुळे, आजवर या खेळाचे गम्य मला काहीच नाही.
हस्ताक्षरावर करडा कटाक्ष
रोज अर्धा तास खरडी (बालबोध आणि मोडी) आणि पंधरा मिनिटांत पुस्ती काढावीच लागे. कागदाला जर कुठे डाग लागला किंवा एखादे अक्षर कित्त्याप्रमाणे नीटसे आले नाही. का गालगुच्या चुकायचा नाही. तो चुकला तर कचकावून कानपिळणी ठरलेली. "ज्याचे हस्ताक्षर खराब त्याची दानत खराब" हे तिचे पालुपद शंभरदा ऐकावे लागत असे. मराठी गद्यपद विभाग, इतिहास, भूगोल या विषयांत शंभरापैकी सत्तर- पंच्याहत्तर मार्क मिळाले तरी ती संतापायची. शंभरच्या शंभर मिळाले पाहिजेत असा तिचा आग्रह. पुढे इंग्रजीच्या बाबतीतही हाच खाक्या. गणित विषयात मात्र आम्ही मोठे रँग्लर! घोट्या मारूनही कधी पास झालो नाही. आकडे पाहिले का मला आकड्याच यायच्या म्हणाना तोंडचे हिशोब माझे वैरी.
दिपोटी मुलांना उभे रहायला सांगून तोंडचा हिशोब सांगायचे. मनातल्या मनात उत्तर निघाले का या मुलाने खाली बसायचे, सर्व मुले बसली की "उठा, ल्याहा उत्तरे पाटीवर." एकमेकांच्या पाठमोरी तोंडे करून पाटीवर उत्तर लिहायचे. माझ्या जवळच भिमा उमाजी मारवाडी नावाचा एक शाळासोबती होता. तो होता लेकाचा बुटका. मी उंचाड्या. त्याच्या खांदाड्यावरून तो लिहीत असलेले हुकमी उत्तर मी सहीसही कॉपी करायचा. दिपोटी पाट्या पाहून चूक बरोबर सांगायचे. तीन तोंडचे हिशोब बरोबर आले की पास. हा नियम. पण त्यातही एक गोम असायची. कसा सोडवलास हा हिशोब? असा प्रश्न दिपोटी कोणाला तरी विचारायचे आणि त्याने तो रीतीसह सांगायचा.
सांगण्यात चूक झाली नि पाटीवर उत्तर बिनचूक असले तरी तेही चूकच धरले जायचे, माझ्यावर ही पाळी न येवो, अशी माझी सारखी धाकधूक चाललेली असायची. तो प्रसंग टळला की हायसे वाटायचे. तोंडच्या हिशोबात झाला बुवा ठाकरे एकदाचा पास, पण गणितात गचकला. हा तिसरी पास होऊन चवथीत जाईपर्यंतचा क्रम! गणिताचे नि माझेच काय, पण माझ्या सगळ्या कुटुंबियांचे एवढे वैर का? ते समजत नाही. अपवाद सांगायचा तर आमचा धाकटा बंधू कै. यशवंतराव ठाकरे त्याचे गणित उत्तम. या विषयाबद्दल त्याला रॉबर्टमनी हायस्कुलात स्कॉलरशिप मिळत असे. आम्ही कधी स्कॉलरच नव्हतो तर शिप कसली मिळणार?
असले तळतळाट आमच्या घरात नकोत
जुन्या पिढीतल्या लोकांना भूमिगत नितीगत अचानक द्रव्यलाभाची मोठी आशा असे. पेशवाईच्या अखेरीला बंडाळ्यांना ऊत आला होता. लोकांची सर्वत्र पळापळ चालू असायची. त्यावेळी त्यांनी जागोजाग काही द्रव्य पुरून ठेवलेले. देशोधडीला गेलेले ते परत आलेच नाहीत. ती डबोली मागाहून इतरांच्या हाती लागत आणि फट्दिशी त्याचे भाग्य उफलायचे. खंडाळा घाट होत असताना, शेकडो कामदार कामगारांची नशिबे अशी फळफळल्याची उदाहरणे जो तो बोलत असे. विंग्रेजी जमान्यात तो मामला बंद पडला आणि सोडती (लॉटया) चालू झाल्या. इतर शेकडो कुटुंबांप्रमाणे आमचे कुटुंबही ये रे दिवसा भर रे पोटा थाटाचे. एखादी भलीभक्कम सोडत लागलीच, तर मुलांचे शिक्षण खूपसे करू नि होतील मग ते वकील मामलतदार, या आशेने बय आजीने एकदा दोन रुपये वडलांकडून आणि दोन विनायकराव काकाकडून घेऊन गोण्डल स्टेटमधल्या सोडतीची आम्हा चार भावंडांच्या नावांनी चार तिकिटे घेतली. त्या घटनेचा ताईच्या चरित्राशी संबंध असल्यामुळे येथे ती सारांशात सांगत आहे.
गोण्डल सोडतीचा खूप गाजावाजा झाला. मामलतदार मुन्सफापासून तो थेट बाजारपेठेतल्या हमालांपर्यंत सगळ्यांनी अंदाजे चार-पाच हजार रुपये या जुगारीत घातले असतील. त्याबद्दल वर्तमानपत्रात बातमी येण्याचेच एकाएकी बंद झाले. ज्याला त्याला पहिल्या लाख रुपये बक्षिसाची आशा आणि ते हमखास मिळणार, याचा गावच्या चेडोबा म्हसोबाने त्याला कौल दिलेला. सारे संभावित जुगारी चिताक्रान्त झाले. शंभर-दोनशे सह्यांचा एक तक्रार अर्ज मुंबई सरकारकडे मामलतदाराने धाडला. इतर गावांहूनही अशाच तक्रारी आल्या. सरकारने एकदम गोण्डल संस्थानातल्या त्या लॉटरीवर जप्ती नेली. सोडतीचा निकाल मागेच लागला होता आणि कारभाऱ्यांनी जवळपासची बक्षिसे वाटून, दूरदूरची गटायस्वाहा केली होती कागदपत्र रकमांच्या जप्तीत तपासणी करताना पहिले एक लाख रुपयांचे बक्षिस "केशव सीताराम ठाकरे, पनवेल" नावाच्या तिकिटाला लागले होते.
हाती लागलेल्या शिलकी रकमेच्या हिस्सेरशीने याटणी करता. त्या नंबरच्या वाट्याला अवघे ७५ रुपये आले. मुंबई सरकारातून ते पनवेल मामलतदार कचेरीत बटवड यासाठी आले. वडलांनी सही करून ते घेतले. "अहो, एवढे तर एवढे. सध्या आपल्याला काय थोडे झाले? आणि तेही खरेच. दरमहा पाचत्रिक पंधरा रुपयांच्या पलीकडे ज्याच्या हाताला जादा दमडीचा स्पर्शही होणे नाही, त्या वडलांच्या हातात एकरकमी पंचाहत्तर रुपये, नि तेही हक्काचे यावे हा काय लहानसहान योगायोग?" पण ताई हा सर्व प्रकार रागट चेहऱ्याने पाहत ऐकत होती. घरात आलेल्या लक्ष्मीचा शेजारी-पाजारी आबालवृद्धांच्या तोंडून गौरव होत असलेला पाहून, ती कडाडली हा लक्ष्मीचा फेरा नाही. आक्काबाईचा फेरा आहे समजलात? एक रुपयाच्या बदली ७५ आले. वरचे ७४ रुपये काय त्या सोडतवाल्यांनी आपल्या पदरचे घातले होय? इतर ७४ जणाना लुटले नि ही भर केली. ते आता तडफडत असतील. अगदी एक लाखाचे बक्षिस मिळाले असते, तरी आमच्या घरात नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव लोकांचे तळतळाट आले असते समजलात? पैश्याचा असला मोह काही यशाला जात नसतो. अंगमेहनत करावी, बुद्धी चालवावी. नि मिळेल ती चटणी भाकर निर्धास्त खावी. हा कसला जुगारीचा छंद नि त्याचे काय एवढे कौतुक करायचे!
मुंबईसारख्या मोहमयी शहरात आज गेली पाऊणशे वर्षे मी रहात आहे. पण ताईच्या या कडकडीत उपदेशानुसार हयातीत एकदाही मी जुगारीच्या कसल्याही फंदात पडलो नाही. पुष्कळांना चमत्कारिक वाटेल, महालक्ष्मीचा रेसकोर्स कसा असतो, हे मला माहीत नाही.
शाळा मास्तरांचे अजरामर स्मरण
बिगर यत्तेच्या दत्तोपंत रानडे मास्तरांपासून तो थेट देवास येथील प्रिन्सिपल गंगाधर नारायण शास्त्री, एम. ए. यांच्यापर्यंत एकूणेक मास्तरांची वरचेवर या ना त्या निमित्ताने, मला आठवण होऊन त्यांच्याबद्दलच्या आदराने अजूनही मन हेलावते. पनवेलच्या मराठी शाळेतले मास्तर फक्त मराठी सहावी पास झालेले आणि इंग्रेजी शाळेतले मास्तर फक्त मॅट्रिक झालेले. पण त्यांची विद्यार्थ्यांना शिकवण्याची हातोटी चालू जमान्यातल्या एकाही गुरुजीत किंवा सरात मला दिसत नाही तो छडी लागे छम् छम् चा जमाना होता. रोज दहापाच छड्या खाल्ल्याशिवाय शाळा सुटायची नाही. पण आम्हा मुलांना कधीही मास्तरांचा दुस्वास वाटला नाही, किंवा छडीच्या माराने हाताचे तळवे सुजलेले पाहून मुलांचे आईबाप मास्तरांच्या नावाने ठणाणा करीत अथवा फिर्यादीच्या धमक्या देत शाळेत घुसले नाहीत. अभ्यासात चूक झाली किंवा गैरवर्तन केले की फटकावलेच पाहिजे, हा दण्डक सर्वमान्य होता, म्हणूनच कारकुंडे निपजले तरी आत्तासारखे गुंड निपजत नसत.
पहिल्या यत्तेवर बोडस मास्तर होते. एकदा वाचताना आणि शब्दाचा उच्चार मी `आणी` केला. जवळ बोलावून मास्तराने प्रथम एक थोबाडीत दिली आणि हा उच्चार वर्गात शंभर वेळा मोठ्याने वदवून घेतला. एका यत्तेचे दोन वर्ग असले तर त्या दोघा मास्तरांत मुलांच्या परीक्षेच्या तयारीची सात्विक चुरस लागायची. मराठी चवथ्या यत्तेच्या दोन वर्गांवर देवधर आणि नेने असे दोन मास्तर होते. बहुतेक मुले चवथी पास होताच इंग्रेजी शाळेत जायची. तेव्हा त्यांचे सर्व विषय उत्तम होणेच अगत्याचे. दुसऱ्या तुकडीपेक्षा आपल्या तुकडीतील अधिक मुले नापास होणे ही नामुष्कीची गोष्ट समजली जात असे. मी होतो देवधरांच्या वर्गात गणित विषयातली आमची कीर्ती सर्वश्रुत!
देवधरांनी आम्हा चारपाच गणितातल्या `ढ` ना रोज संध्याकाळी आपल्या बिऱ्हाडी गणिताचा घोट्या मारायला बोलावले. आठ साडेआठपर्यंत ते सारखे शिकवीत असायचे, जेवायला केव्हा उठायचे? असे बायकोने विचारताच मास्तर तिच्या अंगावर खेकसायचे, "अग, या धोंड्यांचे मला देव बनवायचे आहेत, जेवणाचे काय घेऊन बसलीस. तू घे आपलं उरकून हवं तर." आणि या साऱ्या श्रमांबद्दल म्हणजे शिकवणीबद्दल देवधर एक कपर्दीकही मागायचे नाहीत. आपली मुले उत्तम शिकावी. त्यांनी ज्ञानी होऊन आमची आठवण काढावी. या एकाच हेतूने प्रेरित झालेली ती मास्तरमंडळी असत.
इंग्रेजी शाळेत दुसऱ्या यत्तेवरचे सोमण मास्तर म्हणजे कर्दनकाळ, किंचित चूक झाली की काढलाच फोडून त्या विद्यार्थ्याला. मग तो कोणत्या का वर्गातला नि कोणाचा का असेना. शिकवण्यात हातखंडा. त्याकाळी सारे विषय एकाच मास्तराला शिकवावे लागत असत. इंग्रेजी चवथ्या यत्तेवरच्या रामभाऊ गोखल्यांच्या शिकवणीचा, त्यांच्या डौलदार इंग्रेजी मराठी हस्ताक्षरांच्या वळणाचा आणि टापटिपीचा माझ्या जीवनावर अतिशय खोल परिणाम झाला. त्या यत्तेत आम्हाला प्रोज वाचनासाठी `सॅन्फर्ड अॅण्ड मर्टन` आणि पोएट्रीसाठी `पोप्स होमर्स इलियड` पहिला अध्याय लावलेला होता. याशिवाय मराठी गद्यपद्य पुस्तके होतीच, हस्ताक्षरासाठी इंग्रेजी लॉगमनचे बॉण्ड रोज एक तास घटवावे लागत.
गोखले मास्तरांची शिकविण्याची पद्धत अशी असे जनरल नोटबुक म्हणून साध्या फुल्स्केपचे एक जाडजूड चोपडे आम्ही तयार करायचे. एकच हां. आत्ताच्या सारखी गाढवाच्या ओझ्याची एक्झरसाइज बुके नव्हत. फळ्यावर आपल्या डौलदार अक्षरांनी तोडी शिकविलेली पॅराफ्रेज किंवा इतर सामान्यज्ञानाच्या नोटस् ते लिहायचे. आम्ही त्या नोटबुकावर लिहून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही घराहून त्या निराळ्या चोपड्यांत फेअर करून आणायचे. इलियड काव्याच्या पॅराफेजीस तर ते लिहायचेच, पण प्रत्येक दोनचार ओळींचे त्यांनी आर्यावृत्तात केलेले काव्यात्मक भाषांतरही फळयावर ते लिहायचे. अशा धर्तीने नि शिस्तीने अभ्यास करून घेतल्यावर कोण गधडा नापास होणार हो?
इंग्रजी चवथीच्या परीक्षेला सहस्त्रबुद्धे नावाचे दिपोटी आले. इलियडच्या पॅराफ्रेजचा पेपर पाहिल्यावर `या यत्तेतल्या सगळ्या मुलांनी कॉपी केली` म्हणून उसळले. बिचारे शाळामास्तर सारेच घाबरले. दिपोटीपुढे कोण काय बोलणार? तशात सहस्त्रबुदे म्हणजे जमदग्नीचा अवतार. आम्ही चवथ्या यत्तेतल्या मुलांनी कॉपी केली. हा आरोप मला सहन झाला नाही. दिपोटी शेजारीच एका स्वतंत्र खोलीत बसले होते. कोणाला काही मागमूस लागू न देता, गेलो तडक त्यांच्या खोलीत.
मी दिपोटीसाहेब, आम्ही मुलांनी कॉपी केल्याचा आपला आरोप खोटा आहे, सिद्ध करून देतो. साहेब माझ्याकडे आश्चर्याने पहात म्हणाले कर पाहू कसा सिद्ध करतोस ते.
जनरल नोटबुकाच्या पद्धतीने गोखले मास्तरांनी आम्हाला प्रत्येक विषयाची शिकवण कशी दिलेली आहे आणि ती आम्ही सगळ्या मुलांनी कशी आत्मसात केली आहे. हे मी त्यांना समजावून सांगितले. "घेऊन ये पाहू ते तुझे जनरल नोट बुक का काय आहे ते" असे त्यांनी सांगताच मी तडक घरी धावलो नि रफ आणि फेअर दोन्ही चोपडया आणून त्यांच्यापुढे ठेवल्या. "सर, आपण वाटेल तर आमची याच विषयात ओरल (तोंडी परीक्षा) घ्या. एकही मुलगा नापास होणार नाही असे आणखी सांगितले, दिपोटीच्या खोलीत ही ठाकऱ्याची धावपळ काय होत आहे. याचा मुले नि मास्तर सारखाच अचंबा करीत राहिले. मी कोणालाच दाद लागू दिली नाही.
थोडयाच वेळात दिपोटी साहेबांनी एकेका मुलाला आत बोलावले आणि इलियडचा एक एक भाग पॅराफ्रेज करायला सांगितला, जो बाहेर पडेल त्याला तसाच शाळेबाहेर शिपायाकडून घालवायचा. माझी पाळी आली. मी पॅराफ्रेज तर सांगितलीच, पण गोखले मास्तरांच्या त्या भागापुरत्या आर्याही म्हणून दाखविल्या. सहस्त्रबुद्धे खुष झाले. बाहेर आले आणि गोखले मास्तरांच्या पाठीवर शाबासकी देऊन म्हणाले, "मास्तर, तुम्ही नुसते मास्तर नसून खरोखर एक जीनियस आहात, तुमची मुले फार हुशार केलीत तुम्ही, थैंक्यू मिस्टर गोखले", माझ्या उचापतीची हकिकत समजल्यावर गोखले आणि इतर सर्व मास्तरांनी माझे कौतुक केले, हे निराळे सांगायला नको.
माझा चळवळीचा श्रीगणेशा
इंग्रेजी शाळेत एक देवधर नावाचे मास्तर होते, शिकविण्यात अगदीच रङ, एकदा ते गेले चांगले दोनतीन महिन्यांच्या रजेवर. त्यांच्या बदली बाहेरगावचे गाडगीळ नावाचे एक मास्तर नेमण्यात आले. ते होते लंगड़े, एक पायच अधू होता. काठी घेऊन चालायचे, ४-५ यत्तेचा संस्कृत वर्ग त्यांच्याकडे होता. शिवाय तिसरी यत्ता. गाडगीळ संस्कृत छान शिकवायचे.`सिञ्चति, मुञ्चति` या शब्दांचा उच्चार `सिंथति, मुंचति` केलेला त्यांना खपत नसे, मारकुटे होते तरी ते आम्हा विद्यार्थ्यांचे प्यार बनले.
रजा संपताच तो घशात पाचर बसलेल्या आवाजाचा देवधर येणार आणि हा चांगला मास्तर बिऱ्हाडबाजले आटोपून बाहेरगावी जाणार. हे कळताच आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही असे सर्व मुलांच्या वतीने मी आश्वासन दिले. "तुम्हा पोरांना विचारतो कोण रे बाबांनो. बोलून चालून मी बदली. मुदत संपताच गेलेच पाहिजे", असे गाडगीळ म्हणाले. मी पैज मारली. निवडक हिंमती सोबत्यांना एकत्र जमवून काय करायचे त्याचा बेत रचला. मी एक मुद्देसूद अर्ज इंग्रेजीत लिहिला. शाळेतल्या पहिल्या यत्तेपासून तो पाचव्या यत्तेतल्या सर्व विद्यार्थ्यांच्या सह्या घेतल्या आणि म्युनिसिपालिटीच्या सेक्रेटरीला नेऊन दिला. हे सारे काम गुपचुप व्हायचे, सबब जो कोणी या अर्जाबद्दल कुठेही काही बोलेल, त्याला गल्लीत गाडून टोकायचा दम आमच्यातील दमदार पोरांनी भरला.
म्युनिसिपल कमिटीची बैठक भरली. अर्ज वाचण्यात नि तपासण्यात आला. हा अर्ज गोखले मास्तरांनीच लिहिला. हा आक्षेप शाळेचे सेक्रेटरी अन्यंकर मास्तरांपर्यंत येऊन धडकला. देवधरांचे नि गोखल्यांचे जुंपले. "आपण दोघे गावकरी नि तुम्ही त्या दीड टांग्या परस्थ गाडगिळाची बाजू काय घेता?" हा देवधरांचा आक्षेप आणि गोखले तो शपथेवर नाकारीत आहेत. आम्ही सर्व हे पहात होतो. मग मी विचार केला आणि एकटाच त्या भांडणात घुसलो.
"अहो देवधर मास्तर, तो अर्ज मी लिहिला आहे. आम्हा मुलांना तुम्ही नको. काय म्हणणे आहे तुमचे? गाडगिळांच्या जागी तुम्ही याल त्या दिवशी सारी शाळा ओस पाडीन, हे लक्षात ठेवा."
देवधर : तो अर्ज गोखल्यांच्या हॅण्डरायटिंगचा आहे. तू कशाला त्यांची वकिली करतोस? कमिटीतल्या लोकांनीच हे सिद्ध केले आहे.
हां, म्हणजे या भानगडीत हॅण्डरायटिंगचा मुद्दा मुख्य आणि विद्यार्थ्यांची मागणी दुय्यम तसाच गेलो कमिटीच्या बैठकीत बैठक चालूच होती. चेअरमन होते बाप्पासाहेब टिपणीस, वकील. ते आमचे चार हाताजवळचे शेजारी. मला पहाताच म्हणाले, "काय रे, काय काम आहे?"
मी : गाडगीळ मास्तर प्रकरणी लिहिलेला अर्ज मी स्वतः माझ्या हाताने लिहिलेला आहे. त्यात गोखले मास्तरांचा काहीही संबंध नाही आणि या अर्जाची भानगडही त्यांना मुळीच माहीत नाही.
टिपणीस : अरे पण गोखले मास्तरांनी लिहिलेले कितीतरी कागद येथे रेकार्डात आहेत. (शाळेचा सारा पत्रव्यवहार म्युनिसिपल कमिटीशी गोखले करीत असत.) त्यांतले नि यातले हस्ताक्षर बिनचूक एकच आहे.
मी : हो असेल. पण माझे नि गोखल्यांचे हस्ताक्षर एकवळणी आहे, त्याची साक्ष आत्ताच पटवतो.
लगेच मला त्यांनी एक कागद दिला आणि दौत टाक पुढे केला. "ही बोथी नाही चालणार मला. मला `जे` ची बोथी द्या. "गोखले `जे` बोथी वापरीत नि मीही तीच. भराभर अर्धी सरडी लिहून त्यांच्यापुढे ठेवली. सगळ्या मेंबरांनी पाहिली." आहे बुवा, दोघांचे अक्षर एकटाकी. नंतर गाडगीळ प्रश्नावर मी सडेतोड बोललो. अर्थात त्यात गाडगीळ प्रशस्ती आणि देवधरनिंदा असणारच. अक्षर गोखल्यांचे नसून ठाकऱ्यांचे आहे आणि गाडगीळ यांची नेमणूक कायम करण्यात येत आहे, असा ठराव झाला. लगोलग त्याची नक्कल सेक्रेटरी गुप्ते यांच्याकडून घेऊन, तसाच पाच वाजण्याच्या सुमाराला शाळेत धावलो. गोखले मास्तरांनी मला शाबासकी दिली आणि आपल्यावर हकनाक आलेल्या आरोपाची काजळी पुसली गेली, म्हणून ते आपले पाणावलेले डोळे उपरण्याने पुसू लागले. सगळ्या गावात हे प्रकरण ज्याच्या त्याच्या तोंडी झाले. `अरेच्या, हा ठाकऱ्यांचा पोरगा भलताच उलाढाल्या दिसतोय हं.` त्या देवधराला डच्चू दिलाच अखेर.
अखेर लागलीच हातला छापशाई
साधारण इंग्रेजी लिहूबोलू लागल्यावर, नवनवीन माहितीची इंग्रेजी पुस्तके गोळा करण्याचा मला छंद लागला. त्यावेळी मुंबईच्या रस्त्यांवर चांगली चांगली पुस्तके दोनचार पैश्यांना सहज मिळायची. असेच एकदा "पॉकेट एन्सायक्लोपीडिया" चे सुंदर पुस्तक हाती लागले. त्यात फारच मनोरंजक नि चमत्कारिक माहिती वाचायला मिळाली. ज्ञानकोशच तो. जगातले कितीतरी चमत्कार त्यात भरगच्च छापलेले. पैकी छत्र्यांची उत्पत्ती आणि वर्तमानपत्रांची उत्पत्ती या दोन माहितीचे भाषांतर करून ते मी `करमणूक` साप्ताहिकाकडे पाठविले. दोन महिन्यांनी एका शाळासोबत्याने मला रस्त्यात गाठून हटकले -काय रे ठाकरे, अरे तुझा लेख करमणुकीत आलाय तसाच धावलो लायब्ररीत अंक पाहिला. थोडया वेळेपुरता मागून घेऊन घरी आणला नि ताईला दाखवला. तिने भरपूर उत्तेजन दिले. इतक्यात पोष्टमनने हरिभाऊ आपट्यांचे पत्र आणून दिले. त्यात आपले दोन छोटे माहितीचे लेख छापले आहेत. असेच वरचेवर पाठवीत जावे, आपण काय करता ते कळवावे वगैरे मजकूर होता. यानंतर पार सहा महिन्यांनी त्या ज्ञानकोशातली काही मनोरंजक माहिती पाठवीत असे.
वर्तमानपत्रात माझे लेख येतात, याचेच कौतुक गावभर होत गेले. त्यावेळी वर्तमानपत्रे थोडीच आणि त्यात माहिती पाठविणारेही थोडेच जातो कोण त्या नसत्या आडवळणाला? आपला संसार बरा, आपण बरे या प्रवृत्तीचे सगळे गावात पत्रे ती किती यायची? चार आनेवाला टाइम्स ऑफ इंडिया. तो फक्त श्रीमंतासाठी एक प्रत यायची ती मुन्सफ मामलतदार, रजिस्टर आणि अखेर पोस्टमास्तर यांच्या हातात आळीपाळीने आठवडाभर फिरत रहायची आजोळी दैनिक `मुंबई वैभव` आणि साप्ताहिक `जगत्समाचार` (ठाणे) यायचा. तशीच एखादी बातमी आली तर उगाच चारचौघे त्यावर तंबाकूच्या पिचकाच्या मारीत चर्चा करायचे. गावच्या लायब्ररीत दोनचार साप्ताहिके नि एखादे मासिक यायचे तेही कोणी हातात धरायचे नाहीत, "जगातल्या उलाढाली वाचून आम्हाला काय करायचे! पडला असेल रशियात दुष्काळ न आमच्याकडे तो नाही कुठं? रुपयाला दहाबारा पायली कोलंबा तांदूळ मिळायचा. त्याची धारण आलीच ना आता आठावर? वर्तमानपत्रे वाचून का भाव खाली उतरणार आहेत?" सामान्यजनांची ही समजूत लेख लिहिणे, छापणे हा रिकामटेकड्यांचा धंदा.
साप्ताहिक विद्यार्थी" चालू केला
चालू केला म्हणजे कोठेतरी प्रसिद्ध होत असलेला वर्गणीदार म्हणून नव्हे. अस्मादिकांनी तो लिहून छापून प्रसिद्ध करण्याचा खटाटोप चालू केला. मुंबईला गेलो म्हणजे कोणत्या तरी छापखान्यात छपाई कशी चालते, हे मी अगत्याने पहात असे. आपल्याला कशाने तसला छापखाना आजच मिळणार? पण त्याही दिशेने डोके खाजवीत असताना, मामलतदार कचेरीत नोटिसा हुकूम, फर्माने छापण्याचे काम एक शिपाई करीत असे. कारकून जांभळ्या कॉपिंग शाईने कागदावर हुकूम लिहायचा, ओल्या टीपकागदावर शिपाई तो कागद अलगद ठेवून लोखंडी यंत्रात दाबायचा, लिहिलेला मजकूर उलटा टीपकागदावर उठायचा. मग त्यावर कोरे कागद भराभर ठेवून दाबयंत्रात दाबून तो भरामर पन्नास-पंचाहत्तर प्रती अस्सलबरहुकूम छापायचा. हे तंत्र बराच वेळ जवळ उभा राहून मी पाहिले आणि लगेच आपल्या शाळेसाठी `विद्यार्थी` नावाचे आठवड्याचे पत्रक छापायचे मी मनोमन निश्चित केले. जवळ दाबयंत्र नाही म्हणून साध्या फळीने दाब दिला तर काय होते. हा प्रयोग करून पाहिला आणि तो यशस्वी झाला. तात्यांचे स्टेशनरीचे दुकान होते मग काय, घरचाच मामला. सर्व साहित्य आणले आणि स्वतः हाताने नक्षी, मथळा. एकदोन मनोरंजक चित्रे (कुठल्या तरी इंग्रेजी पुस्तकातली टिशू कागदावर नकललेली) आणि शालेय मजकूर लिहून, एक दिवस त्या पत्रकाच्या पन्नास प्रती शाळेत आणून मास्तरांसकट सगळ्यांना वाटल्या.
मास्तर मंडळींमध्ये आश्चर्याची नि कौतुकाची एकच लाट उफाळली. ते मला साधलेच कसे, यावर जो तो बोलू लागला. गोखले मास्तरांनी तर पुढच्या अंकासाठी एक छानदार कविता दिली. (कारण त्यांची एक कविता पहिल्याच अंकात मी छापली होती.) चारसहा महिने हा खटाटोप केला.
ही आठवण मी अजिबात विसरलो होतो. पण त्याकाळचे माझे वर्गसोबती श्री. मनोहरपंत खोपकर यांनी ती माझ्या एकषष्टी समारंभात मुद्दाम सांगितल्यामुळे जिवंत झाली.
फर्डे हेडमास्तर आठल्ये
पनवेलची आमच्या वेळची इंग्रजी शाळा म्हणजे फक्त पाचवी पुरती अँग्लो- व्हर्नाक्युलर. कितीतरी वर्षे तेथे मॅट्रिक पास अभ्यंकरच हेडमास्तर होते. पण म्युनिसिपल कमिटीला अधिक सुधारणा करण्याची हुक्की आली. त्यांनी त्या जागेसाठी बी. ए. पासवाल्यांचे अर्ज मागवले आणि श्री. श्रीधर कृष्णाजी आठल्ये, (एडिटर केरळ कोकीळ यांचे ज्येष्ठ चिरंजीव. हे पुढे पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलचे बरीच वर्षे प्रिंसिपल होते.) यांची नेमणूक झाली. ते नुकतेच मलबारहून आलेले. तिकडेही ते शिक्षकच होते. फाडफाड इंग्रेजीशिवाय ते बोलतच नसत. पाचव्या यत्तेला `लॅम्ब्स टेल्स ऑफ शेक्सपियर` गद्य टेक्स्ट बुक लावलेले होते. इतर सोबत्यांपेक्षा माझा नंबर इंग्रेजीत नेहमी पहिलाच असाचया. पण अचानक तो लॅम्ब नि तो शेक्सपियर भेटल्यामुळे, मी बराच गोंधळलो. पहिला धडा चालू केला `टेमिंग ऑफ द थ्रू` चा.
वर्गात माझे मौन पाहून आठल्ये मास्तर कडाडले- "काय ठाकरेबूवा, तुम्ही तर म्हणे इंग्रेजीचे प्रोफेसर आणि गेला आठवडा पहातो तो अगदीच `ढ` आहात की." (सारे इंग्रेजीतच.) मी उत्तर दिले-" सर, हा लॅम्ब ऊर्फ कोकरू साहेब कोण आणि तो शेक्सपियर तरी कोण याचा आम्हा कोणालाच काही बोध झालेला नाही, आणि तुम्ही तर एकदम ती श्रू का कोण कजाग बाई आहे, तिच्या धड्याला केलीत सुरुवात. म्हणून आमचा गोंधळ उडाला आहे. "यू आर राइट" मास्तर उद्गारले. त्यांनी मग चांगले दोन दिवस या मुद्यावर माहितीपूर्ण प्रवचन केले. इतकेच नव्हे तर त्यावेळी गावात शाहूनगरवासीचा मुक्काम होता, त्यांच्या गणपतरावांना आठल्ये मास्तर जाऊन भेटले. "आमच्या वर्गात शेक्सपियरची नाटके अभ्यासाला लावली आहेत. आपण त्या नाटकांचे प्रयोग करीत असता. मराठी रूपांतरे मुलांनी प्रत्यक्ष पाहिली म्हणजे त्या त्या नाटकातील आशयाचे रहस्य त्यांना चटकन उमजत जाईल. म्हणून आपण काही सवलतीने मला तिकिटे विकू शकाल काय? माझ्या वर्गात अवघी पंधरा मुले आहेत. आठल्ये मास्तर म्हणाले.
गणपतराव : अहो, आठल्येसाहेब, शाहूनगरवासीच्या शेक्सपियरी नाटकांबद्दल इतकी जिज्ञासा आणि ती विद्यार्थ्यांसाठी दाखवतो कोण आजकाल? तिकिटांची सवलत कसली मागता? आपण खुशाल आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन येत जा आमच्या शेक्सपियरी नाटकांना. ओट्यावर तुमच्यासाठी खास जागा मोफत ठेवली आहे असे समजा.
शनिवार उजाडला. त्राटिका नाटकाच्या जाहिराती फडकल्या. सकाळचा वर्ग सुटताना आठल्ये मास्तरांनी नोटीस काढली की पाचव्या यत्तेतल्या सर्व मुलांनी जेवून खाऊन रात्री आठच्या सुमाराला हेडमास्तरांच्या बिऱ्हाडी यावे. कां? ते आम्हाला समजलेच नाही. आम्ही गेलो. लागलीच आम्हाला बरोबर घेऊन आठल्ये थेटराकडे निघाले. वाटेत म्हणाले "हे पहा, आज तुम्हाला शाहूनगरवासीचा त्राटिका नाटकाचा प्रयोग मी दाखवणार आहे. तो नीट पहा. म्हणजे `टेमिंग ऑफ द श्रू` या नाटकाचा स्पष्टार्थ लक्षात येईल."
सोमवारी वर्ग चालू झालयावर आठल्ये म्हणाले" काय ठाकरे, पाहिलीस ना ती श्रू कशी होती ती? आता चला भराभर आपल्या धडयाच्या अभ्यासाकडे. यानंतर जेवढी शेक्सपियरी नाटके नगरवासीने केली. ती सारी आम्हाला दाखविण्यात आली. मुलांच्या मानसिक नि बौद्धिक अडचणी लक्षात घेऊन, त्यांची सोयीस्कर सोडवणूक करणारे कितीसे मास्तर सध्याच्या जमान्यात आढळतील?
पाचवी यत्ता झाली पुढे काय?
हा प्रश्न त्याकाळच्या प्रत्येक आईबापांपुढे उभा रहायचा. माझ्या वेळेलाच पाचवी इंग्रेजी म्हणजे पब्लिक सर्विस परीक्षा. ही पद्धत सरकारने बंद केली होती. नाहीतर पाचवी पास होताच सरकारी नोकरी तात्काळ मिळाली असती आणि कुटुंबाच्या संसाराला तेवढाच हातभार लागला असता. पब्लिक सर्विस परीक्षा म्हणजे पाचवी पास झालेले शेकडो लोक रेव्हेन्यू खात्यात नोकरीला लागून हुजूर डेप्यूटी कलेक्टरच्या रांकेपर्यंत चढलेले होते. फक्त अव्वलकारकून किंवा मामलतदार तिसरा वर्ग मिळाल्यावर हायर लोअरची एक खाते-परीक्षा द्यावी लागत असे. बदलत्या जमान्याप्रमाणे आपला मुलगा मॅट्रिक किंवा स्कूल फायनल तरी व्हावा, ही प्रत्येक आई-बापाची मनीषा. पण पनवेल येथे ते कसे साधणार? मुलगा मुंबईला किंवा इतर ठिकाणी `ठेवावा तर तो कोणाकडे? नि त्याचा तेथला खर्च कसा काय आपल्याला झेपणार? हाही मुद्दा सगळ्यानाच सुटण्यासारखा नव्हता. माझ्याबरोबरचा वावंजेकर, गुप्ते वकिलाचा मुलगा अप्पा, पाचवी पास होताच सहजगत्या पुण्याला त्याच्या मेव्हण्याकडे रवाना झाला. पण माझे काय? मी मॅट्रिक होऊन डिस्ट्रिक्ट प्लीडरची परीक्षा द्यावी आणि पनवेल येथे प्रैक्टिस करावी, ही ताईची महत्वाकांक्षा.
सोडवणूक नाडवणूक ठरली
पुष्कळ भवति न भवति झाल्यावर, वडिलांनी कल्याण येथे बदलीचा अर्ज करावा, हा बेत ठरला. तेथे दादर इंग्लिश स्कूलची मॅट्रिकपर्यंत शाखा होती आणि विशेष म्हणजे मला लहानपणापासूनच चित्रकलेचा नाद, आणि कल्याणला ड्रॉइंग क्लास असल्याची बातमी. जमले बदलीचे तर छान. हजार उलाढाल्या नि खटपट करून अखेर कल्याणला वडलांची बदली एकदाची झाली. पण काय म्हणतात ना, दरिद्री चले दरिंये करमले साथ, मोतनखातर डुब्बी मारी, तो शंख लगे हात. तब्बल पंधरा वर्षे एका जागी पनवेलला नोकरी झालेली. बदलीमुळे रहाते घर ओसाड पडले. तात्या आजोबा घरीच राहिले आणि आम्ही सारे कल्याणला गेलो. हेतू केवळ माझ्या पुढच्या शिक्षणाचा. एरवी वडलांच्या बदलीची काही आवश्यकता नव्हती. ती मुद्दाम करून घेतली.
कल्याणला आमचे पाऊल पडले नि त्या शाळेतला ड्रॉइंग क्लास बंद करण्यात आला. दुःखात सुख इतकेच की मॅट्रिक वर्गही त्याच वेळेला कमी करण्यात आला तरी सहावी यत्ता जागेवर होती. शाळेचे प्रिन्सिपल केशवराव भगवंत ताम्हाणे यांनी मला सर्वतोपरी सहाय्य दिले. वर्षभराने सहावीची परीक्षा झाली आणि पुन्हा तोच प्रश्न आता पुढे काय?" दादरला सर्व वर्ग होते, पण तेथे जायचे कसे नि कोणाकडे? दादर नको तर जवळपास ठाण्यालाही मॅट्रिकची सोय होती. पण तेथे रेल्वेचा पास काढण्याइतपत आमच्या खिशाची ताकद नव्हती. सोबतीचे सारे मित्र भराभर ठाण्याला गेले. मी घरीच बसलो.
कल्याणला एळकोटाचा नारळ
कित्येक वास्तूच अशा असतात की तेथे वस्तीला आलेल्यांचा एळकोटच उडायचा. दादर मुंबईचीच गोष्ट घ्या ना. बिल्डिंग अगदी फस्सक्लास. अपटुडेट सोयी. पण तेथल्या एका ठराविक ब्लॉकमध्ये राव जरी बिऱ्हाडाला गेला, तरी तो रंक खंक होऊन रडतच बाहेर पडायचा. इस्पितळाचाही मला अनुभव आहे. एका ठराविक नंबराच्या कॉटवर रोगी आणून ठेवला की तो मेलाच पाहिजे. जे एखाद्या ब्लॉकचे किंवा कॉटचे तेच एखाद्या गावाचेही असते. कल्याण गावाचे नि माझ्या कुटुंबाचे काय खडाष्टक असावे, याचा आजवर तरी मला थांग लागलेला नाही. आजही कल्याण म्हटले की अंगावर काटा उभा रहातो. शक्य तितक्या निर्धाराने मी त्याचा संपर्क टाळतो. व्याख्यानांची आमंत्रणेही टाळतो आणि चुकून माकून आलाच योग, तर तेथून मनस्तापाने मला परतावे लागते.
दहाबारा माणसांचे कुटुंब. गाव परका. बेलीफाची नोकरी. समाजात त्याला कसले स्थान? पनवेलची गोष्ट न्यारी होती. ते आमचे जन्मगाव. तेथल्या लोकांत घराण्याचा बराच आदर नि बोज होता. कल्याणला हो आम्हाला कोण विचारतो? शाळेची गैरसोय होऊन मी घरी बसलो. बरोबरीचे सारे मित्र दररोज डेली पॅसेंजर म्हणून ठाण्याच्या हायस्कुलात जाताना पाहून, गरिबीच्या वेदना मनाला सारख्या दंश करायच्या. हिंमत आहे, हुरूप आहे, महत्त्वाकांक्षा आहे. सर्व काही आहे, पण पैसा नाही. वडलांच्या १५ रुपये पगारात काय भागणार? दाणेवाला, दूधवाला, भाजीवाला इत्यादी वाल्यांची तोंडे मिटवता मिटवता कर्जाचा उकिरडा वाढतच चालला होता. ज्या हेतूने आपण पनवेल सोडून कल्याणला आलो, तो उमलत्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न तर सांदीलाच पडला. बाबा बसायचे कपाळाला हात लावून!
पण शिक्षणाबद्दल माझ्या बरोबरीनेच ताईचे मानसिक यंत्र सारखे चालूच होते. रोज रात्री सोबत्यांच्या घरी जावे आणि शाळेत त्यांचा जो अभ्यास होत असेल, त्यांना जे शिकवले जात असेल, त्याची माहिती आणून घरी अभ्यास चालू ठेवावा, असे ताईने मला सुचविले. हो, पण अभ्यासाला नवी बुके लागतात, ती कोठून आणायची? मित्रांचीच पुस्तके दिवसभरासाठी मागून आणून, मी अभ्यास चालू ठेवला. इतक्यात एका वर्तमानपत्रात सेकण्डहॅण्ड बुकसेलरची जाहिरात वाचली. आता नाव नाही आठवत त्या फणसवाडीतल्या दुकानाचे. गणपत जगन्नाथ अॅण्ड कंपनी, असे काहीतरी असावे. खूप विचार केला नि लिहिले त्यांना एक पत्र. परिस्थिती कळवली आणि आपण मला उधारीने अमुक पुस्तके पाठवीत असाल तर उपकार होतील, सवडीसवडीने पैसे पाठवीन अशी विनंती केली.
अशा विनंत्या कोण मान्य करायला बसलाय म्हणा, पण प्रयत्न करायला काय हरकत? असा विचार. दोनतीन दिवसांत आश्चर्याचा धक्का बसला मला. एक जाडजूड बुकांचे पार्सल घेऊन पोष्टमनजी ठाकले आमच्या बिऱ्हाडाच्या ओटीवर आणि सोबत एक पत्रसुद्धा. हवी असलेली पुस्तके पाठवली आहेत. सवड होईल तसे पैसे पाठवा. निर्धाराने अभ्यास करा. आणखी काही मदत हवी असेल तर खुशाल लिहा. परिस्थितीच्या गडद अंधारात चमकलेला हा अनपेक्षित बिजली बत्तीचा झोत माझ्या आठवणीत चिरजीव झालेला आहे. आजकाल भेटतील का तसले उदारधी महात्मे?
रोज रात्री मित्रांच्या घरी जायचे, नोटस् उतरून घ्यायच्या, असा अभ्यासाचा झपाटा चालवला मी, अभ्यास पूर्ण झाला तर दादरच्या शाळेत परीक्षेला बसवून, तुझी पुढची सोय काहीतरी लावीन, असा दिलासा केशवराव ताम्हण्यांनी मला दिला. इकडे माझा अभ्यास चाललेला आणि घरात सगळेच वांधे. वडलांचा पगार कर्जाच्या खाईत अर्धामुर्धा जायचा. अखेर कडेलोट झाला एके दिवशी. मोखाड्याच्या बाजूला वडील कामगिरीवर गेले असताना, अचानक जंगलात आजारी पडले. खेडुतांनी त्यांना दोनतीन दिवस जंगली औषधपाणी केले नि चार दिवस विलंबाने ते कचेरीत हजर झाले. ठरल्या तारखेला बेलिफ हजर झाला नाही, सबब सस्पेण्ड! कारण ऐकून घ्यायला कोणीच तयार नाही. म्हणे मेडिकल सर्टिफिकेट दाखल करा. जंगलात कोण डॉक्टर मिळणार? आली का पक्की मोकाण्ड! पंधरापैकी सात-आठ रुपया लागायच्या हाताला त्याही आता बंद. एकेक भांडे विकून दिवस साजरे करण्याचा प्रसंग आला. ठाण्याला अपील केले. त्याचा बरावाईट निकाल लागायला दिवसगत लागणार, तोवर कल्याणसारख्या अनोळखी गावात रहायचे जगायचे कसे? भाडेही भरता येईना.
आता मात्र पुरी गच्छंती होणार!
अचानक कल्याणात प्लेगचा धुमाकूळ चालू झाला. सारे गाव उठून बाहेर जाऊ लागले. आम्ही कुठे जायचे नि कसे? वडील तर हातपाय गाळून बसले. आमच्या विषयी अस्सल तळमळीचा असामी केशवराव ताम्हणे. ते होते मुन्सिपालटीचे अध्यक्ष झोपड्या बांधण्यासाठी गरिबांना मुन्सिपालटी बाबू, तट्टे. वासे, काथ्या मोफत पुरविते, अशी बातमी कळल्याबरोबर मी त्यांना कमिटीच्या कचेरीत जाऊन भेटलो. त्यांनी माझ्याकडून अर्ज लिहून घेतला. पण म्हणाले, "अरे, लागेल ते सामान देतो, पण येथून ते वाहून नेणार कोण आणि झोपडी बांधणार तरी कोण?" मी म्हणालो, "सगळे काम आम्ही तिघे भाऊ करू." ताम्हण्यानी कमिटीच्या हातगाडीतून सगळे सामान मौनीबुवांची समाधी आहे त्या तळयाच्या काठावर पाठवले. आम्ही अंगमेहनतीने झोपडे उभारले आणि तेथे गेलो.
हे सारे जमले, पण मम्मंची सोय काय? डाळ-तांदूळ मिळालेच तरी शिजवायला भांडे तर हवे ना. सगळाच फाक्या. आम्ही अशा अशा अवस्थेत आहो, हे सांगायचे नि कळवायचे तरी कोणाला? तात्या पेन्शन घेतल्यावर चार साडेचार रुपये पाठवायचे, त्यांचे पेन्शनच मुळी सव्वासात रुपये. म्हातारा पनवेलला हातांनी शिजवून खायचा. उभ्या हयातीत असा प्रसंग त्यांच्यावर आला नव्हता. पण नातवाच्या शिक्षणासाठी काय येतील त्या अडचणी भोगण्याची त्यांची तयारी.
सहज तळयाच्या काठावर बसलो असताना काही कातकरी लोक तळ्यातून उसाच्या पेराएवढ्या जाड पांढऱ्याफेक वेलाची भेंडोळी ओढून काढीत होते. "काय रे आहे हे" विचारता, “साहेब याला भिसी म्हणतात. मीठ टाकून उकडून आम्ही खातो. लई छान लागते. आम्ही भावांनी ती तशीच काढली. मीठ घालून उकडली. खाऊन पाहिली नि झाले, आमचा रोजचा उदरनिर्वाह सकाळ संध्याकाळ भिसीच्या वेलांवर चालू झाला. शेजारी आवळ्यांचे एक झाड होते. आवळयांना मीठमिरची चोळून ते लोणचे झाले आमचे तोंडीलावणे. शेजारी दहाबारा आणखी झोपड्या होत्या. पण आम्ही नि ते एकमेकांना कशाला विचारणार? शेजारी समाधीजवळ मच्छिंदरनाथ नावाचा एक गोसावी समाधीची पूजाअर्चा करायला असायचा.
नित्यनियमाने सकाळ संध्याकाळ समाधीच्या दर्शनाला नि मच्छिंदरनाथाजवळ गप्पा मारायला मी जायचा. मौनीबुवांच्या मंदिरात (तळवाच्या दुसऱ्या पाळीवर बरेच लांब) गोसाव्यांसाठी अन्नछत्र चालू होते. तेथे मालपुवा, शिरापुरीचे आकण्ठ भोजन जेवून, मच्छिंदरनाथ आणि दोनतीन गोसावी रोज साडेबारा वाजता आमच्या झोपडीवरून ढेकर देत जायचे. आमचे कुटुंब भिसी खाऊन रहात असते, हे कोणालाच आम्ही कळू दिले नाही. मच्छिंदरनाथने अथवा इतर कोणी "काय झाले का जेवण?" म्हणून विचारले तर "होय" एवढेच उत्तर आम्ही देत होतो. असे दोनेक महिने झाल्यावर कोण जाणे कसे कळले ते, पण मच्छिंदरनाथ एके सायंकाळी मी समाधीच्या दर्शनाला गेलो असता मला म्हणाला, "देखो, केसवरावजी, हमने देखा है. आप लोग भिसी खाकर रहते हो."
मी : हां स्वामिजी, बांका बखतने कुछ तो भी करना पडता ही है.
मच्छिंदर : देखो. केशवरावजी, ऐसी मुसिबतको तोडना जरूर है. दिल खुलास रखो, कुछ बुरा नही मानना यहा समाधीपर रोज बहोत चावल पडते है. आप यह लेके जाव.
मी : नही नही स्वामिजी, मै तो छत्री हूं ऐसा काम मेरेसे कभी नहीं बनेंगा, माफ कीजिये.
मच्छिंदरनाथाचे डोळे भरून आले. त्याने माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली नि म्हणाला, "मला भला हो आपका केसवरावजी
सत्यनारायणाचे नसते लिगाड
आमच्या घराण्यात सत्यनारायणाची पूजा कधीच झालेली नव्हती आणि आजही होत नाही. पण संकटांनी ग्रासलेल्या माणसाला काडीचाही आधार मेरूच्या पाठिंब्यासारखा वाटतो. वडलांनी दर गुरुवारी सायंकाळी सत्यनारायण करायचे ठरविले. "बाबा, रोजच चालले आहेत आपले उपास, त्यांत गुरुवारचा एवढा कटाक्ष कशाला? आणि सत्यनारायण करून आणि तेही दर गुरुवारी, काय पदरात पडणार? बरे, गेल्या कित्येक महिन्यांत आपण तांदूळ पाहिला नाही, तर या सत्यनारायणाला गव्हाचा शिरा आणणार कुठून?" पण त्यांच्या गळी ते काही उतरेना. "गव्हाचा नाही तर तांदळाचा करू देईल नारायण त्या दिवसापुरते तरी तांदूळ." झाले. मी दर गुरुवारी मराठी पोथी वाचून पूजा करायचा नि वडलांची वाट पहात बसायचा. पूजा करणे सोपे, प्रसादाची वाट काय? कुठूनतरी ते दोनचार मुठी तांदूळ घेऊन यायचे, अखेर एक दिवस संतापलो आणि स्पष्ट बजावले, "हे सत्यनारायणाचे लिगाड मी नाही चालू देणार. सत्यनारायणचसा काय, देव्हाऱ्यातले सारे देव देतो फेकून या तळ्यात. आम्हाला दातांखाली घालायला नाही तांदळाचा दाणा आणि यांना दाखवायचा कशाचा नैवेद्य? फत्तराचा?” सत्यनारायण चालू झाल्यापासूनच तर परिस्थिती अधिकच बिघडत गेली.
कल्याणचा प्लेग हटला. झोपड्या मोडून लोक भराभर गावात जाऊ लागले. आम्ही कुठे जायचे? तुंबलेले भाडे दिल्याशिवाय जुना घरवाला थोडाच आम्हाला पाऊल ठेवू देणार? अखेर अनंतराव गडकरी यांची एक चाळ होती. त्यांना मी भेटलो. त्यांच्या मातोश्रीने एक खोली दिली.
आता मात्र भिसी रोज आणायची कशी? कसे काय चाले, हे सांगण्यात काय हशील? अपिलाचा निकाल लागण्याची वाट तरी किती दिवस पहायची? नोकरीसाठी मीही अर्जावर अर्ज करीत होतो. एक दिवस उठलो आणि तसाच बिनतिकिटाने गेलो ठाण्याला. डिस्ट्रिक्ट जज्ज रावसाहेब टिपणीस यांना भेटलो. वडिलांच्या सस्पेंशनची सारी हकिकत सांगितली अपिलाच्या निकालासाठी विनवणी केली. रावसाहेबांनी मला चांगले वागवले. ते म्हणाले, "हे पहा मुला, त्या निकालाची वाट पहाण्यात शहाणपणा नाही. राजीनामा माझ्याकडे आण मी लागलीच तो मंजूर करून तुमची सुटका करतो. उगाच कशाला परगावात कुजत पडता? पनवेलला निघून जा." त्याप्रमाणे सर्व केले आणि आता पनवेलला परत जाण्याचा बातबेत ठरवीत होतो, तोच-
धाकट्या भावाला नाळगुदाचा आजार
एक दिवस सकाळी पहातो तो लहानग्या नऊ वर्षांच्या दामूची पावले, पोटऱ्या मांड्या भलत्याच सुजलेल्या. काय झाले म्हणून विचार करतो तो बारा वाजेपर्यंत तो आपदमस्तक तिप्पट फुगला. औषधपाण्यासाठी धावाधाव तरी कुठे नि कशी करायची? ताईला काही औषधे माहीत होती. ती तिने केली. पण अक्कल चालेना. पोटचा गोळा नि आजवर न पाहिलेल्या न ऐकलेल्या भलत्याच रोगाने ग्रासलेला. वडलांनी तर काय आकांतच केला. तिसऱ्या दिवशी दुपारी पोर गेले!
सगळ्यांच्या बरोबर मीही रडत बसलो तर आलेला प्रसंग निपटला जाणार नाही, असा धीट विचार करून, मी बाहेर पडलो. मस्तकात युक्त्याप्रयुक्त्यांचे तुफान भडकले होते. संध्याकाळ झाली. काळोख पडला तेथे गोविंदराव कासार नावाचे एक जळावू लाकडाचे व्यापारी होते. त्यांना भेटलो. त्यांना करुणा आली. गाडीभर लाकडे देण्याचे त्यांनी कबूल केले. "पण स्मशानात ती नेणार कशी? गोविंदरावजी, मला तुमची गाडी द्या." "अहो, पण बैल नाहीत. काही हरकत नाही. आम्ही ओढून नेऊ" तसाच बिऱ्हाडी आलो. दोघा भावांना बरोबर घेतले. गाडीत लाकडे भरली आणि ओढीत आणली. वडलांना थोडा धाकदपटशा दिला नि आम्ही त्याच गाडीवर प्रेत चढवून चौघांनी स्मशानाची वाट धरली नि पुढचा सर्व विधी उरकून रात्री अकरा वाजता परत आलो. आजूबाजूला जातवाल्यांची नि इतर हिंदूची रगड वस्ती होती. पण एकही आमच्या मदतीला धावला नाही.
धाकट्या भावाचा मृत्यू होऊन तीन दिवसही लोटले असतील नसतील, तोच मलाही नाळगुदाने पछाडले. एक दिवस झाला माझे सर्वांग सुजून तिप्पट आकाराचा लाल भोपळा. वडील तर तोंड बडवून घ्यायला लागले, इतक्यात कोणीतरी सुचविले, की बालकृष्ण दिनकर वैद्यांना बोलवा. ते येतील. वैद्य आले. पहिला प्रश्नः याच्या शरीराचा पहिला कोणता भाग सुजला? तोंड, असे उत्तर देताच, "ठीक, नाळगुदाची सूज पायाकडून चढली तर रोग असाध्य असतो. तोंडाकडून चढली आहे, तेव्हा घाबरण्याचे काही कारण नाही, चला देतो औषध." म्हणून वडिलांना बरोबर घेऊन गेले. आठ दिवसांच्या उपचाराने सूज उतरली नि मी बरा झालो आणि वैद्यांच्या दवाखान्यात जाऊन त्यांना नमस्कार करून आलो. आणखी पंधरवडाभर औषधे घेतल्यावर हालचाल करू लागलो. लागलीच पनवेलला जाण्याचा मी हट्टच धरला. पैसे नसले तर सगळेजण पायी चालत जाऊ, पण आता एक दिवस कल्याणला रहायचे नाही." बैलगाडी फक्त माणसे नेण्यापुरतीच हवी होती. सामानसुमान सारे इल्ला! पनवेलची एक बैलगाडी भाड्याने कल्याणला आली होती. ती ठरवून आम्ही अखेर कल्याणच्या त्या नरकवासातून जन्मगावच्या निर्मळ प्रेमळ वातावरणात आलो.
हरहुन्नराने अब्रू राखली
चांगली पंधरासोळा वर्षे कोर्टात बेलिफाची नोकरी केली. पण अखेर कल्याण मुक्कामी वडलांना राजीनामा देण्याचा प्रसंग आला. बस्स, यापुढे नोकरीच करायची नाही कुणाची, हा निर्धार केला. पांढरपेश्याने नोकरी करायची नाही, तर करायचे काय? संसार कसा चालणार? बाहेरगावी हवा तो धंदा व्यवसाय केला तरी चालेल, पण जन्मगावी? लहानाचे मोठे झालो, जिथे आपले घर आहे. लोकांत काही पांढरपेशी इभ्रत आहे, त्या गावी? काय हरकत आहे? सुतार, लोहार, गवंडी, बोहरी हे काय कारकुनी करतात? कसलाही धंदा करायला लाज शरम येते कुठून?
पनवेलीला परत आल्यावर सात आठ दिवसांतच बाबांनी एक उद्योग काढला शोधून. बाजारात गेले आणि मजुरांच्या डोक्यांवर पाचसहा डझन राकेलचे रिकामे डबे आणि काही हत्यारे घेऊन आले. "चला रे पोरांनो, आपण आता टीनचे डबे तयार करायचे आहेत." धूतपापेश्वर मंदिराला त्यावेळी टीनच्या लहानमोठ्या डब्यांची फार गरज असायची. ते मुंबईहून मागवावे लागत असत. दररोज लहान शंभर मध्यम पन्नास आणि मोठे पंचवीसतीस डबे, पुरवायचे कंत्राट बाबांनी घेतले. या कामी ते आम्हा सगळ्या मुलांना (शाळेचा वेळ सोडून) कामाला लावायचे आणि स्वतःतर सकाळपासून सायंकाळी चार वाजेतोवर काम करायचे. प्रमाणशीर पत्रे कापणे, डब्यांचे काठ तयार करणे, डाग लावणे वगैरे सर्व कला आम्ही त्यावेळी शिकलो. पांढरपेशा आसामी टीनमेकर झाला म्हणून नाके मुरडताना कोणी दिसला तर, "घरात बेकार बसून उसनवारीवर संसार चालविण्यापेक्षा, असली करामतीची कामे करायलाही अक्कल लागते, शहामतही लागते, समजलात?" असे उत्तर बाबा ठणकावून द्यायचे.
दररोज संध्याकाळी डब्यांची गोणपाटी गाठोडी मी स्वतः कारखान्यात नेऊन तात्या पुराणिकांना देत असे. ते तेव्हाच ठरलेला पैसा मला देत असत. खर्चाचे वजा जाता. दररोज अंदाजे दोन ते अडीच-तीन रुपये कमाई होत असे. बाबा म्हणायचे बघा पोरांनो, बेलिफीत महिनाअखेर पंधरा रुपटक्या पदरात पडायच्या, अशी अंगमेहनतीची कामे केली तर एवढा रोजमुरा रोज तयार.
अचानक आलेला योग
कल्याण सुटले नि पनवेल गाठली, तरी माझ्या शिक्षणाचे पुढे काय? हा प्रश्न तसाच लोंबकळत राहिला. वडलांच्या टीनस्मिथीत कामे करीत असतानाच, मी आपला अभ्यासक्रम तसाच पुढे चालू ठेवला होता. इतक्यात अचानक मध्यहिंदुस्थानातल्या देवास संस्थानात वकिली करणारे वडलांचे मामा राजाराम नारायण गडकरी सहकुटंब इकडच्या नातेवाइकांना भेटायला येताहेत असे पत्र आले. पाठोपाठ ती मंडळीही आली. महिनाभर मुक्काम झाला. "या मुलाचे पुढच्या शिक्षणाचे येथे कुठे जमत नाही, तर मी जातो त्याला बरोबर घेऊन देवासला. पुढची सारी जबाबदारी माझी." असा दुंद्यामामांनी सवाल टाकला. (राजारामपंतांना आम्ही सारेच लहानथोर दुंद्यामामा म्हणायचे.)
ताईने तात्काळ होकार दिला. बय कशाला नकार देणार? दुंद्यामामा तिचे सख्खे धाकटे भाऊ. देवास-इंदोरचे नामांकित वकील नि राजेलोकांचे विश्वासू सल्लागार. तसे म्हटले तर मी आठ वर्षांचा असताना सन १८९२ साली बय आणि विनायकराव काकांच्या बरोबर देवासचा फेरफटका केलेलाच होता. त्यावेळी शंभरावर वयाचे मांगाचे वडील नाना (माझे पणजोबा) हयात होते. इतके वय झाले, दृष्टीही साफ गेली होती, तरी म्हातारा ताठ नि खडखडीत होता. लाकडाची गाडी आली की कोयत्याने लाकडे तोडून तळमजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर (माळ्यावर) ती रचून ठेवीत असत. नानांनी जुन्या जमान्यात अनेकवेळा कोकणातून इंदोर-धारच्या सफरी पायी केलेल्या होत्या. ना त्याकाळी रेल्वे, ना हमरस्त्यांची सोय. जागोजाग भिल्लांच्या लुटारू चौक्या. पण म्हातारा तशाही परिस्थितीत सफरा करीत असे. मामा पनवेल-मुंबईच्या दौऱ्यावर आले तेव्हा ते हयात नव्हते. साधकबाधक विचार होऊन, सर्वानुमते माझी पुढल्या शिक्षणासाठी देवासला रवानगी झाली.
प्रकरण ५
देवासचे राजकारण
देवासला येताच तेथील व्हिक्टोरिया हायस्कुलात मी नाव घातले, तेथील हकिकत सांगण्यापूर्वी त्याच वेळेला देवास येथे एक मोठी राजकारणी क्रांती झाली तिची हकिकत सांगितली पाहिजे, तेथे दोन राजे, दोन राजवाडे, आणि राजधानीही बडी पाती नि छोटी पाती अशा दोन विभागात विभागलेली. हा सन १९०१-०२ चा सुमार असावा. बड्या पातीचे वयोवृद्ध महाराज श्रीमंत कृष्णराव बाबासाहेब पवार हे दिवंगत झाले होते. त्यांची पहिली राणी ग्वालेरच्या जयाजीराव शिंद्यांची कन्या. ती आधीच वारली होती. काही वर्षे विधुरावस्थेत घालविल्यावर, महाराजांनी एका खानदानी घराण्यातल्या तरुणीशी विवाह केला आणि लगेच दोन-तीन वर्षातच त्यांचे देहावसान झाले.
घाईघाईने दत्तक घेतलेले तुकोजीराव पवार त्यावेळी अगदीच अल्पवयी होते. म्हणून संस्थानचा कारभार पहाण्यासाठी लाला बिसेसरनाथ नावाचे एक वयस्क `सुपरदंट` ब्रिटिशांनी नेमलेले होते. लालाजींचा नातू शंभूनाथ आमच्याच हायस्कुलात शिकत होता. तो ज्यूनियर (इ. पाचवी) मध्ये नि मी होतो मिडल क्लास (इ. सहावी) मध्ये. शाळेत शंभूनाथ सगळ्यांचा मोठा प्यारा होता अगदी. राजबिंडा पण त्याचा उजवा हात लंजूर होता. तरीही डाव्या हाताने लिहिणे आणि क्रिकेट खेळात बॅटिंग करणे वगैरे कामे तो सफाईने करायचा. सुतारी वर्गात त्याची प्रगती वर्णनीय असे. अभ्यासातही तल्लख नि चोख. त्याचे विशेष क्वॉलिफिकेशन म्हणजे तो हार्मोनियम फारच छान वाजवायचा. सुपरदंटाचा नातू होता, तरी सगळ्यांशी तो सरमिसळ वागायचा.
राजवाडयातील अवस्था
राजवाडयात तरुण राणी एकटी. छोटे तुकोजीराव यांचा बंदोबस्त निराळा. दासदासी हुजऱ्यांचा जो हुकूम मेळावा सभोवार कितीही असला, आणि मासाहेब मासाहेब म्हणून राणीची कितीही सरबराई होत असली, तरी तारुण्याने मुसमुसलेल्या विधवा राणीच्या बहकत्या मनाला पाट घालण्यासाठी काही तरी कशाचा तरी विरंगुळा हवा का नको? फिरायला बाहेर पडायचे, ते पडदानशीनच गाडीतून. सुखसोयीचे केवढेही पर्वत हुकमी उमे असले, तरी उरले लांबलचक जीवन कण्ठायचे कसे? संस्थानातले राजेराण्याचे खाजगी जीवनसुद्धा कमालीचे यांत्रिक. ठराविक गाठीभेठी, भाषणाचाही ठराविकपणाच. त्यात सामान्याचा जीवनातला जिव्हाळा अजिबात नसायचा.
मासाहेबांच्या जीवनाचा यांत्रिक ठराविकपणा किंचित्काळ घालवण्यासाठी शंभूनाथाच्या हार्मोनियम वादनाचा कार्यक्रम त्याच्यापुढे करावा, असे कोणीतरी सुपरदंट लालाजींना सुचविले. लालाजी साधासीधा जण्टलमन, सूचनेची गंगोत्री निघाली कुठून, याचा शोध तो बिचारा कशाला घेतो? त्यांनी तात्काळ होकार दिला. शंभूनाथाच्या हार्मोनियमचा कार्यक्रम राणीपुढे झाला. फार खुष झाल्या मासाहेब आणि त्यांनी लगेच सुपरदंट लालाजींना विनंती पाठविली की आम्हालाही हार्मोनियम वादन शिकण्याची इच्छा आहे. सबब आपले चिरंजीवांना दररोज सायंकाळी आम्हाला धडे द्यायला पाठवीत जाणे. त्यालाही लालाजींची संमती मिळावी. आणि शाळा सुटताच शंभूनाथची स्वारी राजवाडयात नेमाने जाऊ लागली. हा क्रम मी देवाला जाण्यापूर्वीच वर्ष दीडवर्ष चालू होता.
एका रात्रीत उलथापालथ
देवासचे पोस्ट-तार हापीस त्यावेळी गावाबाहेर होते. तेथले मास्तर श्री. प्रधान माझ्या ओळखीचे निघाले. रोज सायंकाळी गप्पा मारायला मी तेथे जायचा. एके सायंकाळी पाहतो. तो पोस्ट बंद झाले तरी तारायंत्रावर मास्तर कडकडकट करीत बसलेले. येणाऱ्या तारा शिपायाबरोबर भराभर बाहेर रवाना होताहेत आणि बाहेरून दरबाराचे शिपाई तारा आणून देत आहेत. "जरा गप्प बसा. आज कामाचा भयंकर रेट्या आहे. इंदोरच्या पोलिटिकल एजंटाची सारखी तारातारी चालली आहे." असे त्यांनी मला सुचविले. मी शेजारी बसूनच राहिलो सौ. प्रधानबाईंनी चहाचे दोन कप टेबलावर आणून ठेवले, मी घेतला, पण मास्तरांचा कप तसाच थंड होऊन गेला. कडकडकट्पासून त्यांना डोके वर करताच येईना, आठ वाजले. मी जायला निघालो. तसे थांबा म्हणाले.
इतक्यात पोस्टासमोरून एक बुरख्याचा रथ, मागेपुढे इंदोरचे स्वार, आघाडीला एक युरोपियन गोरा अधिकारी असा लवाजमा दौडत इंदोरकडे गेल्याचे दिसले. लगेच मास्तरांनी कडकडकट चालू केली. ते पुरे होताच म्हणजे किंचित उसंत मिळताच, मास्तर म्हणाले, "केशवराव, सांगू नका कुणाला आत्ताच. पण बड्या पातीत उजाडण्याच्या आतच सुपरदेटांची अदलाबदल नि सगळ्याच भानगडीचा भोपळा फुटणार आता हा लवाजमा गेला तो पाहिलात ना? लार्ड कर्झनच्या हुकुमावरून राणीसाहेबांची देखतहुकूम इंदोरला उचलबांगडी झाली. कसले तरी ऑपरेशन आहे नि ते दिल्लीच्या हॉस्पिटलात व्हायचे आहे. `मी` म्हंजे? आहे काय भानगड?" मास्तर अहो, आज ना उद्या हे होणारच होते. इतक्यात यंत्रावर कडकडकट आले नि मास्तर तारा लिहू लागले. मी त्याचा निरोप घेऊन परतत असतानाच सुपरदंटांच्या हापिसाजवळ पोलिसांचा हत्यारबंद पहारा नि लोकांची थोडीशी गर्दी दिसली. तार हापिसात घडलेली हकिकत मी मामाना सांगितली. खेदमिश्रित स्मितहास्य करून ते उद्गारले, "अरे बाबा, अग्नीपाशी नवनीताची. हे असे होणारच होत."
आमचे बिऱ्हाड कोतवाली व सुपरदंटी हापिसाच्या जवळच होते. जेवण उरकून मी तिकडे काय चालले आहे, हे पहायला गेलो. थोड्याच वेळात परत येऊन तळमजल्यावरील माझ्या खोलीत वाचीत बसलो. रात्री अकराच्या सुमाराला मामांचे रजपूत अशील सरदार दौलतसिंग नि त्याचे बंधू रघुवीरसिंग त्यांच्या भेटीला आले. ते तडक माडीवर गेले. जिन्यात जाऊन मी त्याचे भाषण ऐकू लागलो. नवीन सुपरदंट रावजी जनार्दन भिडे, इंदोर पोलिटिक खात्यातले आले आहेत आणि लालाजीकडून कामाचा चार्ज घेत आहेत. बरोबर हत्यारबंद स्वार आले आहेत, लालाजींच्या मंडळींची देवास सोडण्याची लगबग चालू होती. इतक्यात मागेपुढे घोडेस्वार असलेल्या ब्रूम गाडीतून लाला बिसेसरनाथ आणि भिडे आमच्या घरावरून राजवाड्याकडे जाताना दिसले. राजवाडा, खजिना, तुरुंग वगैरेंचा भिड्यांनी रात्री साडेबारा वाजेतोवर चार्ज घेतला आणि एकाच्या सुमारास लालाजी सहकुटुंब सहपरिवार देवास सोडून गेले. लालाजी आपल्या समतोल कारभाराने लोकांत फार प्रिय होते. जाताना कसलाही सत्कार करता आला नाही, याबद्दल सकाळी गावभर चर्चा चालली होती.
संस्थानी वातावरणात पुणेरी इंगा
रावसाहेब भिड्यांनी एकजात सगळ्या कारकुनाना रात्रभर कामाला जुंपले, खुद महाराज ज्या रथवजा गाडीतून फेरफटका करायचे. ती गाडीघोडे रातोरात साफ-सफाई करून, पहाटेला आपल्या दरवाजाशी आणून उभी करण्याचे हुकूम सोडले. सूर्योदय होतो न होतो तोच भिडे सुपरदंट त्या रथातून शहरीभेटीला आगेमागे स्वार दौडत आहेत, अशा थाटाने बाहेर पडले. तुळतुळीत घेरेबाज गोट्यावर पुणेरी लाल पगडी, अंगात शुभ्र पेशवायी अंगरखा, जरीचे उपरणे, सुरवार, अशा थाटाने स्वारी रस्त्याने जात असता, नागरिक लोक बाहेर येऊन त्यांना मुजरे करीत होती. बरोबर दहा वाजता हापिसात हजर रहाण्याची आणि किंचित उशीर झाल्यास दंडाची कडक शिस्त चालू झाली जुन्या जमान्यातल्या तंबाकूपिचकाऱ्या बंद. कारकुनाची मोठी पंचाईत झाली पण करतात काय? दिवाणी फौजदारी खटले स्वतः भिडे यांच्यासमोर चालायचे. बड्या पातीत एक नवाच मनू उगवला.
देवासचे माझे शैक्षणिक जीवन
तेथे गेलो तो लीव्हिंग सर्टिफिकेटाशिवाय, व्हिक्टोरिया हायस्कुलचे प्रिन्सिपल गंगाधर नारायण शास्त्री (पंडया) एम. ए. त्यांच्यापुढे प्रवेशासाठी गेलो. सुरवातच इंग्रेजीतून केली. परिस्थिती सांगितली. तिकडे फाडफाड इंग्रेजी बोलणारे क्वचितच होते. सब कुछ हिंदीमें. शास्त्रीबुवांनी आमची मिडलक्लास (इ. सहावी) मध्ये पाठवणी केली. पनवेल-कल्याणला वर्गातली सारी मुले एकाच बाकावर बसायची. येथे पहातो तो दोनदोन विद्यार्थ्यांना एकेक डेस्काची व्यवस्था विषयाप्रमाणे दर तासाला निरनिराळा मास्तर, नवलाईची गोष्टच होती ती मला त्यावेळी (सन १९०१) देवास संस्थानात हिंदी, मराठी, ऊर्दू सगळ्या शाळांतले शिक्षण मोफत होते इंग्रेजी चौथीपर्यंत फी नाही. फक्त पाचवीला दोन आणे, सहावीला चार आणे आणि अॅण्ट्रन्स (माँट्रिक) ला आठ आणे फी त्यावेळच्या मास्तरांची काही नावे आठवतात ती अशी : देसाई, नान्देडकर, देव, दाणी, देसाई गणितावर नान्देडकर इतिहास, शास्त्रीबुवा इंग्रेजीवर तेथे मी जाण्यापूर्वी काही दिवस व्हिक्टोरियाचे प्रिन्सिपल लेले धारला बदलून गेले होते. लेले मध्यभारतातले नामांकित इतिहास संशोधक होते. त्यानी नागद्याच्या पहाडातून एक प्रचंड शिळा शोधून काढली होती. त्यावर संस्कृतातील सगळ्या टेन्सचे टर्मिनेशन्स खोदलेले होते. ही शीळा आमच्या हास्कूलातील म्युझियममधे ठेवलेली होती. भूर्गशास्त्राचा त्यांच अभ्यास दांडगा होता.
बिनचूक ईश्वराची भेट
एकदा लेले मास्तर धारहून मुद्दाम देवासला आले असता, शास्त्रीबुवांनी त्याचे शाळेच्या अंगणात भूगर्भशास्त्रावर व्याख्यान करवले. शेकडो प्रकारचे लहानमोठे दगडगोटे त्यांनी बरोबर आणले होते. प्रत्येकाविषयी ते अत्यंत तळमळीने भाषण करून आम्हाला समजावीत होते. अखेर ते म्हणाले, "मुलांनो, आपण या दगड्योंड्यांचा जसजसा विचार करू लागतो. तसतसा तो आपल्याला थेट परमेश्वराजवळ नेऊ शकतो." "भाविकपणाने लेल्यांनी काढलेल्या या तात्विक उद्गारांचा आम्हा तत्त्वज्ञानशून्य पोरांवर परिणाम तो काय होणार? काय? समजलेना तुम्हाला? असे पुन्हा विचारून ते माझ्याकडे बोट दाखवून म्हणाले, सांग बरं तू आता काय तुला समजले ते?"
मी उभा राहिलो. "सांग बरं (एक गोटा उचलून) हा परमेश्वराची ओळख पटवतो का नाही? `मी` होय, कोणाच्याही टाळक्यात ठणकावून मारला तर तो ताबडतोब परमेश्वराच्या भेटीला जाईल हे आमचे प्रगाढ तत्त्वज्ञान ऐकताच, व्याख्यान संपले नि सभा बरखास्त झाली. शास्त्रीबुवांनी मला लायब्ररीत बोलावून, "गाढवासारखे बोललास ते" म्हणून धमकावले. "शास्त्रीबुवा, भूगर्भशास्त्र नुसतं कल्पेनेत आणण्याइतपत तरी आमच्या अकलेची कमावणी झालेले आहे का? लेल्यांनी व्याख्यान द्यायचे नि जायचे. आम्हा पोरांना प्रश्न कशाला टाकायचा? नि आम्ही उत्तर तरी काय द्यायचे? म्हणून सुचले ते दिले. त्यांचा अवमान झाला असेल तर मी आत्ता जाऊन त्यांच्या पाया पडतो" तसाच निघालो नि शेजारच्या खोलीत जाऊन लेल्यांचे पाय धरले. शास्त्रीबुवा बरोबर होते. मला पहाताच लेले खोखो हसू लागले. मला हातांनी उठवून लेले हसत हसत म्हणाले. कमाल केलीस तू आज फार चिकित्सक दिसतोय. (शास्त्रीबुवांना) असलीच मुले पुढे संशोधक बनतात."
शास्त्रीबुवांची शिक्षणपद्धती
शास्त्रीबुवा जबरदस्त पट्टीचे व्युत्पन्न होते. इंग्रेजीच्या तासाला ते आले की लायब्ररीतून संदर्भ ग्रंथांच्या राशीच्या राशी टेबलावर आणुन ठेवताना वर्गातल्या मॉनिटर विद्यार्थ्यांची धावपळ सारखी चालू असायची. मिल्टनचे लालाग्रो, ऑलिव्हर गोल्डस्मिथची डेझर्टड व्हिलेज आणि ट्रॅव्हलर ही काव्ये शास्त्रीबुवा तन्मयतेने शिकवायचे. लालायो कवितेतले "हेस्ट दी निम्फ अॅण्ड प्रिंग विथ दी" हे एकच वाक्य वर्णिताना नुसत्या `हेस्ट` शब्दातील त्वरा नि गती सांगण्यासाठी शास्त्रीबुवा तब्बल तीन दिवस नाना ग्रंथातील संदर्भ दाखवून शिकवत होते. त्यांची व्याख्याने म्हणजे आम्हा विद्यार्थ्यांना रसाळ ज्ञानामृताच्या मेजवानीसारखी वाटायची. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे आणखी केवढा विशाल ज्ञानसागर उफाळलेला आहे. याची आम्हाला त्याच वेळी फार छान जाणीव होऊ लागली. शिक्षकाने नुसते समोरचे घडे शिकविण्यापेक्षा, विद्यार्थ्यांना त्या विषयाची गोडी लावण्यातच कर्तव्याची खरी करामत असते.
आपला विद्यार्थी बहुश्रुत व्हावा, एवढ्यासाठी देवासच्या जवळपास कोणीही नामांकित व्यक्ती आली की शास्त्रीबुवा त्यांना पाचारण करून, शाळेत त्यांच्या व्याख्यानांचा महोत्सव करायचे. दहा व्याख्याने प्रसिद्ध हंसस्वरूप स्वामी यांच्या दहा व्याख्यानांचा आणि प्रणायाम शिक्षणाचा सोहळा शाळेच्या आवारात त्यांनी पंधरवडाभर साजरा केला. बनारस सेण्ट्रल हिंदू कॉलेजचे सहकारी संस्थापक प्राचार्य भगवानदास (मुंबईचे माजी राज्यपाल श्री. श्रीप्रकाश याचे पूज्य पिताजी) यांचीही व्याख्याने करविली. डॉ. अॅनी बेझंट या इंदोरला आल्या असता, त्यांनाही पाचारून, शास्त्रीबुवांनी त्यांच्या व्याख्यानांचा कार्यक्रम शाळेत केला. त्यावेळी बाईचे स्वागत करण्यासाठी स्वतः शास्त्रीबुवांनी एक इंग्रेजी कविता रचली होती. समारंभाच्या नांदीला ती माझ्याकडून त्यांनी म्हणवून घेतली. त्यातल्या दोनच ओळी आज आठवत आहेत त्या अशा-
Hail to thee, thou giver of light,
Thy noble presence spreads delight.
सर्वसामान्य ज्ञानाची गंगोत्री शास्त्रीबुवा
त्याकाळी खरे म्हटले तर आम्हा विद्यार्थ्यांना श्रीमंत सावकार काय, शेतकरी काय, मजूर काय, त्यांचे परस्पर ऋणानुबंध काय, या प्रमेयांचे काहीच ज्ञान नव्हते. शिक्षण खात्याने नेमलेल्या पुस्तकांचा अभ्यास करावा, घोट्या माराव्या, परीक्षा पास व्हाव्या आणि जमेल त्या अर्थात कारकुनी-पोटापाण्याच्या मार्गाला लागावे. इतकीच महत्त्वाकांक्षा असायची. पण शास्त्रीबुवांच्या शिकवणीचा खाक्या न्यारा, नेमलेल्या ग्रंथातूनच ते आम्हाला जागतिक सर्वसामान्य ज्ञानाची चटक कशी लावीत असत, याचा थोडासाच मासला सांगतो. गोल्डस्मिथचे डेझर्टड व्हिलेज काव्य ते शिकवीत होते.
Sweet Auburn! loveliest
village of the plain,
Where health and plenty
cheered the laboring swain.
सुखवस्तु, स्वयंपूर्ण आणि स्वयंसिद्ध अशा त्या मनोरम ऑबर्न खेड्याचा श्रीमंत सावकारशाहीने अखेर कसा घात केला, याचे शास्त्रीबुवांचे अत्यंत जिव्हाळ्याचे प्रवचन, त्याकाळी आम्हाला केवळ विद्वताप्रचुर वाटायचे. पण पुढे मुंबईला येऊन संसार थाटल्यावर, येथे गिरण्याचे संप आणि त्यामुळे कामगाराचे होणारे हाल नजरेला पडले, तेव्हा त्यांच्या त्या जिव्हाळ्याचा चटका प्रत्यक्ष पटू लागला.
I`ll fares the land to hastening ills a prey,
Where wealth accumulates and men decay;
Princes and lords may flourish or may fade,
A breath can make them as a breath hath made.
But the bold peasantry, the country`s pride
When once destroyed. can never be supplied.
यावर नुसते प्रवचनच नव्हे, तर शास्त्रीबुवा मुद्दाम आम्हाला एखाद्या खेड्यात घेऊन जायचे. आम्हाला तळमळीने सांगायचे, "पहा, किती विस्तीर्ण शेतवाड्या या. नुसते पहात बसलो तरी जीव हरकून जातो. समजा, उद्या या ठिकाणी सारा शहरी दिमाख आला नि शेतकरी कारखान्यातला हमाल बनला तर सारी दुनियाच अन्नाला मोताद होईल, शेतकरी मेला की देश मेला. हा गोल्डस्मिथचा सिद्धांत", सार्वत्रिक जनहिताच्या क्षेत्रात शेतकऱ्यांचे महत्त्व नि महात्म्य केवढे थोर असते, याची तपशीलवार प्रवचने देत असताना शास्त्रीबुवांच्या तन्मयतेचे माझ्या मनावर उमटलेले चित्र. सन १९२८-२९ साली मुंबईला झालेल्या सहा महिन्यांच्या मुदतीच्या गिरणी कामगारांच्या संपाच्या वेळी आठवणीत थरारून उटले. आणि जवळकरांच्या आग्रहावरून मी लिहिलेल्या शेतकन्यांचे स्वराज्य या पुस्तकात, शास्त्रीबुवांच्या उपकाराचे ऋण फेडताना अत्यंत तळमळीने चित्रित केले आहे. सारांश, आज माझी जी बौद्धिक कमाई झालेली आहे. तिचे सारे श्रेय पुन्हा एकदा शास्त्रीबुवांना देऊन या गाथेत ते कृतज्ञतेने नमूद करून ठेवतो.
दुसरे अविस्मरणीय गुरू
व्हिक्टोरिया हायस्कुलात संस्कृत शिक्षणाची जबाबदारी महामहोपाध्याय सदाशिवशास्त्री पटवर्धन यांच्याकडे असे. महामहोपाध्याय पदवी त्यांना आहेर देणगी मिळालेली नव्हती. काशीच्या संस्कृत विद्यापीठाची परीक्षा देऊन ती त्यानी पटकावलेली होती. या शास्त्रीबुवांचा खाक्या अगदी साधा आणि शुद्ध स्वदेशी, डोक्याला इंदोरी ढाल पागोटे, पेशवाई अंगरखा. खांद्यावर शुभ्र उपरणे, धोतर शाळेत आल्यावर मात्र फक्त सदरा आणि टोपी, त्यांच्या वर्गात बाकडी नसायची. सतरंजी पसरलेली. त्यावर मुलांनी आसनमांड्या घालून बसायचे. शास्त्रीबुवांसाठी छोटी गादी नि मागे लोड समोर आम्ही वर्तुळाकार बसायचे, त्यांना इंग्रेजी समजायचे, पण फारसे वाचता बोलता यायचे नाही.
भांडारकरांच्या संस्कृत पहिल्या पुस्तकातले इंग्रेजी वाक्य "इज दी सेकिण्ड कॅज्युगेशन इज वेरी डिफिकल्ट, ओन्ली टू रूट्स आर गिवन् इन धिस बुक" असे वाचायचे. पटर्वधन किडकिड्या सडपातळ अंगाचे पण उंच धिप्पाड असायचे. गादीवर आपल्या लांब टांगांचा आकडा घालून ते रेळून बसायचे. संस्कृतचा वर्ग रोज गीतेतल्या चार नव्या श्लोकांच्या पाठांतराने चालू व्हायचा. सहावीला `हितोपदेश` लावलेला होता. संस्कृत विषयाबद्दल माझी अनास्था एकदा त्यांच्या नजरेला येताच, ते म्हणाले, "काय रे ठाकरे, इंग्रेजीत तू एवढा फर्डा, पण संस्कृतातच असा कसा रे कच्चा? हे चालणार नाही. आजपासून रोज शाळा सुटल्यावर माझ्या घरी तुला आलेच पाहिजे, समजलास? माझ्या वर्गातला विद्यार्थी संस्कृतात कच्चा राहून नापास झालेला मला चालणार नाही."
आज्ञेप्रमाणे मी त्यांच्या घरी जाऊ लागलो, पहिल्याच दिवशी शास्त्रीबुवांनी संस्कृत विद्येच्या महात्म्याबद्दल असे काही बालबोध नि रसाळ व्याख्यान दिले, आणि हितोपदेशातली काव्यमय स्थळे वर्णन करून सांगितली, की त्याच क्षणापासून संस्कृताच्या अध्ययनाची मला गोडी लागली आस्था वाढली. निसर्गवर्णनात पटर्वधन शास्त्री कमालीचे तन्मय होऊन जात असत सहा महिने त्यांनी मला घरी शिकवले शिकवणीचे पैसे बियसे काही नाहीत हो! असे होते त्यावेळचे आमचे सदाशिवशास्त्री पटवर्धन नाहीतर आत्ताचे गुरुजी!
निश्चयाचा महामेरू काळकर मास्तर
आमच्या हायस्कुलात विष्णुपंत रामचंद्र काळकर नावाचे एक मास्तर होते. ते सर्व वर्गात निरनिराळे विषय शिकवायाचे. एकदा मला कळले की ते नॉन-मैट्रिक आहेत. इतर सगळे मास्तर गॅज्वेट, पण काळकर नॉन-मॅट्रिक, कित्येक वेळा तर मेट्रिकच्या वर्गावरही इंग्रजीसाठी त्याची नेमणूक व्हायची वर्तनात काय अथवा शिकवण्यात काय, माणूस फर्डा, तरतरीत आणि अपटुडेट बोलण्यात स्पष्टवक्ता प्रि. शास्त्रीबुवांपासून सगळ्यांना त्यांचा आदर नि दरारा वाटायचा. हे काय गूढ होत?
कोणती ग्रहदशा काळकरांना भोवत होती न कळे दरसाल ते स्वतः शिकवलेल्या विद्यार्थ्यांबरोबर मॅट्रिकला बसायचे. मात्र मास्तर नॉन-मैट्रिक ते नॉन-मेट्रिकच, पण काळकर अक्षरश: निश्चयाचा महामेरू अपजयाने लवमात्र हताश न होता, त्यांनी वर्षातून चारही युनिव्हर्सिट्यांच्या मॅट्रिकच्या परीक्षेला बसण्याचा आपला क्रम सोडला नाही. "जगेन तर बीए ऑनर्स म्हणूनच" हा त्यांचा निर्धार ते उघडपणे बोलून दाखवीत असत. आणि खरोखरच त्यांच्या तपश्चर्येला अखेर फळ आले नि व्हिक्टोरियातच ते ग्रॅज्युएट म्हणून गौरविले गेले.
सन १९३८ साली मी देवासला गेले असताना नारायण पाठशाळेच्या (म्हणजे जुन्या व्हिक्टोरियाच्या) प्रिंसिपलनी शाळेच्या आवारात माझे व्याख्यान करविले. त्यात काळकर मास्तराची ही आठवण रंगवून सांगत असताना आता ते कुठे असतील, कोण जाणे, पण त्या निश्चयाच्या महामेरूला माझे प्रणिपात असोत हे वाक्य बोलताच अगदी माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसलेले एक अतिवृद्ध गृहस्थ चटकन उभे राहिले आणि "हा आहे ठाकरे, तुमचा काळकर मास्तर शेजारी बसलेला" असे म्हणून त्यांनी मला मिठी मारली. मी त्यांचे पाय धरले.
आंब्याची शेल नि भुट्टयाची शेल
शाळा असली तरी तेथला खाक्या संस्थानी श्रीमंतीचा कोठे काही न्यून पडायचे नाही. आंब्याच्या हंगामात दोन्ही पात्यांतल्या सर्वभाषी शाळांतल्या मुलामुलींना आंब्याची शेल (मेजवानी) देण्यात येत असे. गावोगावाहून तऱ्हेतऱ्हेच्या आंब्यांच्या गाड्या भरून यायच्या त्यात रसाळ आंब्यांचा भरणा रगड, मग सगळ्या मुलांच्या पंगती बसवायच्या खुद्द दोन्ही पात्यांचे छोटे महाराजही शेलला यायचे. प्रत्येक मुलाला नि मुलीला दोनदोन तीनतीन आंबे चोखायला द्यायचे संपले का आणखी वाढायचे. मागाहून मोठाल्या द्रोणांतून रसाची वाढणी झाली का संपली शेल, मोठा उत्सवच असायचा तो.
भुट्ट्याच्या (मक्याच्या कणसांच्या) शेलचा हाच प्रकार प्रथम भाजलेली कणसे आणि नंतर खमंग शिजवलेला त्यांचा शिरा यांचे वाटप होऊन शेल संपायची. सारे शिक्षक आणि वरच्या वर्गाचे विद्यार्थी या कामी खेळीमेळीने एकमेकांची थट्टामस्करी करीत एकजूट राबायचे.
या व्हिक्टोरिया हायस्कूलच्या वातावरणाने आज मी जसा आहे तसा मला बनवला, त्या ज्ञानदात्या मातेला प्रणाम करून, जुन्या आठवणींची मालिका सध्या येथेच संपवितो.
ती विचार क्रांतिकारक रात्र
माझ्या अभ्यासक्रमावर राजाराम मामांची कडवी नजर होती. ते बडोद्याच्या बडोदा वत्सल पत्रात राजकारणी भानगडीविषयी प्र` या टोपणनावाखाली आठवडयातून एकदा लेख पाठवायचे. इंदोर संस्थानात शिवाजीराव होळकरांविरुद्ध काही मतलबी लोकांची चळवळ आणि कारस्थाने चाललेली होती. त्यांचा ते आपल्या लेखांतून कडकडीत समाचार घेत असत. तिकडे पुण्याला सुप्रसिद्ध लेखक धनुर्धारी हे होळकरांच्या निंदकांचा केसरीतून समाचार घ्यायचे आणि मामा देवासकडून बडोद्याच्या पत्रांत तेच करायचे. आठआठ, दहादहा फूलस्केप सरडीचे लेखन, मामा बोलायचे नि मी लिहायचा. हस्व-दीर्घ- अनुस्वारादी भानगडी ते वरचेवर तपासायचे.
आज्ञेप्रमाणे मी त्यांच्या घरी जाऊ लागलो, पहिल्याच दिवशी शास्त्रीबुवांनी संस्कृत विद्येच्या महात्म्याबद्दल असे काही बालबोध नि रसाळ व्याख्यान दिले, आणि हितोपदेशातली काव्यमय स्थळे वर्णन करून सांगितली, की त्याच क्षणापासून संस्कृताच्या अध्ययनाची मला गोडी लागली आस्था वाढली. निसर्गवर्णनात पटर्वधन शास्त्री कमालीचे तन्मय होऊन जात असत सहा महिने त्यांनी मला घरी शिकवले शिकवणीचे पैसे बियसे काही नाहीत हो! असे होते त्यावेळचे आमचे सदाशिवशास्त्री पटवर्धन नाहीतर आत्ताचे गुरुजी!
निश्चयाचा महामेरू काळकर मास्तर
आमच्या हायस्कुलात विष्णुपंत रामचंद्र काळकर नावाचे एक मास्तर होते. ते सर्व वर्गात निरनिराळे विषय शिकवायाचे. एकदा मला कळले की ते नॉन-मैट्रिक आहेत. इतर सगळे मास्तर गॅज्वेट, पण काळकर नॉन-मॅट्रिक, कित्येक वेळा तर मेट्रिकच्या वर्गावरही इंग्रजीसाठी त्याची नेमणूक व्हायची वर्तनात काय अथवा शिकवण्यात काय, माणूस फर्डा, तरतरीत आणि अपटुडेट बोलण्यात स्पष्टवक्ता प्रि. शास्त्रीबुवांपासून सगळ्यांना त्यांचा आदर नि दरारा वाटायचा. हे काय गूढ होत?
कोणती ग्रहदशा काळकरांना भोवत होती न कळे दरसाल ते स्वतः शिकवलेल्या विद्यार्थ्यांबरोबर मॅट्रिकला बसायचे. मात्र मास्तर नॉन-मैट्रिक ते नॉन-मेट्रिकच, पण काळकर अक्षरश: निश्चयाचा महामेरू अपजयाने लवमात्र हताश न होता, त्यांनी वर्षातून चारही युनिव्हर्सिट्यांच्या मॅट्रिकच्या परीक्षेला बसण्याचा आपला क्रम सोडला नाही. "जगेन तर बीए ऑनर्स म्हणूनच" हा त्यांचा निर्धार ते उघडपणे बोलून दाखवीत असत. आणि खरोखरच त्यांच्या तपश्चर्येला अखेर फळ आले नि व्हिक्टोरियातच ते ग्रॅज्युएट म्हणून गौरविले गेले.
सन १९३८ साली मी देवासला गेले असताना नारायण पाठशाळेच्या (म्हणजे जुन्या व्हिक्टोरियाच्या) प्रिंसिपलनी शाळेच्या आवारात माझे व्याख्यान करविले. त्यात काळकर मास्तराची ही आठवण रंगवून सांगत असताना आता ते कुठे असतील, कोण जाणे, पण त्या निश्चयाच्या महामेरूला माझे प्रणिपात असोत हे वाक्य बोलताच अगदी माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसलेले एक अतिवृद्ध गृहस्थ चटकन उभे राहिले आणि "हा आहे ठाकरे, तुमचा काळकर मास्तर शेजारी बसलेला" असे म्हणून त्यांनी मला मिठी मारली. मी त्यांचे पाय धरले.
आंब्याची शेल नि भुट्टयाची शेल
शाळा असली तरी तेथला खाक्या संस्थानी श्रीमंतीचा कोठे काही न्यून पडायचे नाही. आंब्याच्या हंगामात दोन्ही पात्यांतल्या सर्वभाषी शाळांतल्या मुलामुलींना आंब्याची शेल (मेजवानी) देण्यात येत असे. गावोगावाहून तऱ्हेतऱ्हेच्या आंब्यांच्या गाड्या भरून यायच्या त्यात रसाळ आंब्यांचा भरणा रगड, मग सगळ्या मुलांच्या पंगती बसवायच्या खुद्द दोन्ही पात्यांचे छोटे महाराजही शेलला यायचे. प्रत्येक मुलाला नि मुलीला दोनदोन तीनतीन आंबे चोखायला द्यायचे संपले का आणखी वाढायचे. मागाहून मोठाल्या द्रोणांतून रसाची वाढणी झाली का संपली शेल, मोठा उत्सवच असायचा तो.
भुट्ट्याच्या (मक्याच्या कणसांच्या) शेलचा हाच प्रकार प्रथम भाजलेली कणसे आणि नंतर खमंग शिजवलेला त्यांचा शिरा यांचे वाटप होऊन शेल संपायची. सारे शिक्षक आणि वरच्या वर्गाचे विद्यार्थी या कामी खेळीमेळीने एकमेकांची थट्टामस्करी करीत एकजूट राबायचे.
या व्हिक्टोरिया हायस्कूलच्या वातावरणाने आज मी जसा आहे तसा मला बनवला, त्या ज्ञानदात्या मातेला प्रणाम करून, जुन्या आठवणींची मालिका सध्या येथेच संपवितो.
ती विचार क्रांतिकारक रात्र
माझ्या अभ्यासक्रमावर राजाराम मामांची कडवी नजर होती. ते बडोद्याच्या बडोदा वत्सल पत्रात राजकारणी भानगडीविषयी प्र` या टोपणनावाखाली आठवडयातून एकदा लेख पाठवायचे. इंदोर संस्थानात शिवाजीराव होळकरांविरुद्ध काही मतलबी लोकांची चळवळ आणि कारस्थाने चाललेली होती. त्यांचा ते आपल्या लेखांतून कडकडीत समाचार घेत असत. तिकडे पुण्याला सुप्रसिद्ध लेखक धनुर्धारी हे होळकरांच्या निंदकांचा केसरीतून समाचार घ्यायचे आणि मामा देवासकडून बडोद्याच्या पत्रांत तेच करायचे. आठआठ, दहादहा फूलस्केप सरडीचे लेखन, मामा बोलायचे नि मी लिहायचा. हस्व-दीर्घ- अनुस्वारादी भानगडी ते वरचेवर तपासायचे.
हा क्रम चालू असताच, एक दिवस मला निबंधमाला हे जाडजूड पुस्तक त्यांनी आणून दिले आणि त्यातला लोकहितवादी हा निबंध वाचून ठेवायला सांगितले. लोक काय, हित काय नि वादी काय, मला त्यात काही रस वाटेना. मामा तर दररोज विचारायचे, काय केशव किती पाने वाचली? मी द्यायचा ठोकून कधी पाच, तर कधी दहा तर कधी पंधरा ते शाबासकी द्यायचे. पण ही आमची थापेबाजी फार दिवस टिकली नाही. एका रात्री जेवण उरकल्यावर त्यांचा तो दैनिक प्रश्न आलाच. काही तरी आकडा सांगितला मी. मामा हसत हसत म्हणाले, `तू सांगत आलेले आकडे हे पहा मी भीतीवर लिहून ठेवले आहेत. आजचा आकडा धरून त्याची बेरीज २५० होते आहेत का त्या निबंधाची पाने तेवढी? थोडा वेळ थांबून मी म्हटले. "मामा, या निबंधात माझ मन काही रमत नाही."
रात्रीचे दहा वाजले होते. सगळीकडे सामसूम होती, "असं का? ठीक. ये पाहू बस असा माझ्या समोर." आणि मामानी महाराष्ट्राच्या लष्करी, धार्मिक, राजकारणी जडणघडणीवर थेट श्री शिवाजी महाराजांच्या अवतारापासून तो थेट चिपळूणकर, टिळक, फुले, लोकहितवादी पर्यंत, फार काय पण देशी संस्थानांतल्या शेकडो घडामोडींवर असे काही तळमळीचे वक्तृत्वपूर्ण प्रवचन करायला सुरवात केली की तन्मय होऊन मी ऐकत होतो नि मामा सारखे बोलत होते. दोघेही आम्ही इतके आमच्या विषयात रंगलो की चहा झालाय, तोंडे धुवा आता असा मामीचा इषारा येताच उमगले की उजाडले संबंध रात्रीत आम्हाला शेजारच्या कोतवालीतला दर पंधरा मिनिटाला होणार गजरही ऐकू आला नाही. आज माझी अनेक विषयावर जी मते आहेत. जो स्पष्टवक्तेपणा लाभलेला आहे. स्वाध्यायाची जी हिरिरी आज वर्षीही कायम आहे. त्या सगळ्या आचारविचार क्रांतीचा पाया देवास येथे एका रात्री राजाराम मामांनी बसवला. त्याचीच फलश्रुती आहे. उजाडल्या दिवसापासून मी अगदी निराळाच आदमी बनलो महाराष्ट्र, त्याचा इतिहास, परंपरा, संस्कृती इत्यादीचा मी कट्टर अभिमानी बनलो. माणसाचा बौद्धिक पुनर्जन्म म्हणतात तो हा असा व्हावा लागतो.
मामांचा नि भिडयांचा खटका उडतो
रावसाहेब सुपरदंट भिडे यांच्या समोरच सारे दिवाणी फौजदारी खटले चालायचे. संस्थानात दिवाणी खटले फार एका खटल्यात कायद्याच्या अर्थावर भिडे नि मामा यांचा मोठा याद झाला. मामांचा मुद्दा मिडे जुमानीत ना प्रकरण वर्दळीला गेले आणि "हे पहा सुपरदंट साहेब, वकिलीच्या कामात मी माझी हयात खर्ची घातली आहे कायद्यांचा कीस पाडला आहे. आपणापुढे वाद घालताना, काही नवा मनू उगवला आहे. अशातला प्रश्न नाही कायदे तेच नित्याचा भावार्थही तोच आपण फक्त बीएच आहात. आपल्याला कायदा कितीसा समजतो कोण जाणे." अशा अर्थाची खटकाखटकी उडाली. भिड्यांना तो आपला अपमान झालासे वाटले नि दुसऱ्या दिवशी राजारामपताची वकिली सनद रद्द केल्याचा हुकूम बजावला.
मामांचा अशीलवर्ग सारा मोठमोठ्या रजपूत सरदाराचा त्यांची जहागिरी जमिनीची वाटपे निः इतर खेकटी आता कोण मिटवणार? रोजगारच बंद पडल्यामुळे, घरात फाक्या पडू लागले, मामा मनस्वी मानी आत्यंतिक संकटाच्या वेळीही त्यांचा बाणेदारपणाचा पीळ लवमात्र ढिला व्हायचा नाही. तथापि परिस्थितीची आणि पूर्व उपकारांची जाणीव ठेवून, दौलतसिंग आम्हाला वरचेवर जोंधळा, भाजी वगैरे पुरवीत असे असे सहा महिने गेले फार हालाखीत दिवस जात होते. रहात्या घराचे भाडेही देता येईना. अखेर बड्या पातीतल्या दत्तमंदिराच्या मठपतीने आम्हाला मंदिराच्या एका माडीवर बिऱ्हाडाला जागा दिली.
इतक्या झाबुवा संस्थानात मैजिस्ट्रेटची जागा खाली होती तेथे मामानी अर्ज देताच, त्यांची तेथे नेमणूक झाली ते तिकडे जाणार मग माझी काय सोय? हा प्रश्न पडला दत्तमंदिराच्या बुवांनी माझ्या एक वेळच्या जेवणाची जबाबदारी पत्करली आणि मी देवासलाच रहाण्याचे कबूल केल्यावर मामा सहकुटुंब झाबुव्याला निघून गेले दत्तबुवा माझे ताट स्वच्छ टोपलीखाली झाकून ठेवायचे दुपारच्या सुट्टीत आल्यावर ताट माडीवर आणायचे, पोटभर जेवायचे, ताटवाटी विहिरीवर घासून परत करायची. असा क्रम सहा महिने चालला होता जेवणाची सोय लागली पण शाळेची फी वगैरे किरकोळ खर्च होताच ना चिकटलेला त्याची सोडवणूक करण्यासाठी देवास येथील कानूनगो जहागिरदाराची मी शिकवणी धरलेली होती. त्याचे दरमहा १० रुपये मिळायचे.
मिडल क्लाची परीक्षा पास
मिडल क्लासची म्हणजे इंग्रेजी सहावीची आमचे परीक्षक म्हणजे एक जाडे प्रस्थच होते. इंदोर येथील सरदार कॉलेजचे प्रिन्सिपल मि आर एच गनियन साहेब परीक्षेच्या दिवशी ठराविक विषयाचे पेपर सीलबंद चामडी थैलीतून सांडणीस्वाराबरोबर इंदोरहून यायचे. हॉलमध्ये आम्ही मुले गुपचूप व्यवस्थित बसलेली पेपरांची वाट पहात. इतक्यात सांडणीच्या गळ्यात बांधलेल्या घंटांचे नाद ऐकू यायचे शास्त्रीबुवा अंगणात जायचे स्वार खाली उतरून थैली द्यायचा. ती घेऊन ते हॉलमध्ये यायचे. थैलीचे सील स्वारासमक्षम फोडून पेपर काढायचे नि आम्हाला वाटायचे. संध्याकाळी लिहिलेले पेपर जमा करून थैलीत सीलबंद घालून स्वाराबरोबर इंदोरला रवाना व्हायचे. असा क्रम चार दिवस चालायचा. एक महिन्याने खुद गनियन साहेब रिझल्टाचा तक्ता घेऊन देवासला यायचे. गेस्ट हाऊसवर त्यांच्या बादशाही सरबराईची धामधूम चालायची.
साहेब रिझल्ट घेऊन आले. मिडलच्या परीक्षेला आम्ही अकरा जण बसलो होतो. रिझल्टावर दहा पास. त्यांत ठाकरे नापास मी म्हणजे हायस्कुलातले एक प्रस्थच म्हणाना गणितात गचकणारा रँग्लर मी! म्हणे इतिहासात गचकलो शक्य नाही ते. मी शास्त्रीबुवांना भेटलो नि गनियनची गाठ घेण्याचा आग्रह धरला गेलो लायब्ररीत साहेब बसले होते तेथे, गुड मॉर्निंगची सलामी ठोकली आणि नाव सांगून इंग्रेजीतच भाषण चालू केले. "साहेब, इतिहासात आपण मला कसा नि का नापास केलाहात, त्याचा तपशील मला हवा." दोघेही इंग्रेजीतच बोलू लागलो.
गनियन : हो आलास हे बरे केलेस. काय रे मुला, पुढे कोण होण्याची तुझी उमेद आहे?
मी : वृत्तपत्रकार ( एडीटर)
गनियन : तसा मी तर्क केलाच होता म्हणा, पण प्रश्नाची पेपरात उत्तरे कशी द्यायची. हे नाही कोणी शिकवले?
भानगड अशी होती. इतिहासाच्या प्रश्नांत अकबर औरंगाजेबाची तुलना, हा ठराविक प्रश्न होता. त्यावर मी औरंगजेबला अकबरापेक्षा श्रेष्ठ ठरविला होता आणि विधानांच्या समर्थनात चांगले सातआठ चतकोर खर्च केले होते. साहेब म्हणाले, हे तुझे मत विचित्र दिसते,
मी : मग सर, प्रश्नातच असे लिहायला हवे होते की अकबराचा पुरस्कार करा म्हणून. आपण आम्हाला प्रश्न टाकला आणि आमच्या मतांप्रमाणे आम्ही उत्तर दिले. विधाने चूक असतील तर तसे सांगा.
साहेब खुष झाले नि हसत हसत म्हणाले - "इतिहासात तू नापास झाल्याने एवढ्याचसाठी मी पुकारले की समक्ष तुझी भेट घ्यावी म्हणून तुझे उत्तर नि विधाने जोरदार आहेत. इंग्रेजी भाषेवर तुझी छान कमाण्ड आहे. पण बाळ एकदोन चतकोरात नसते का तुला तुझे उत्तर देता आले? तुझा पेपर म्हणजे एक न्यूजपेपरच झाला."
साहेब बाहेर आले नि त्यांनी पास विद्यार्थ्यात माझे नाव घातले. शाळेतील पोरही कसली आचरट त्यांनी हूल उठवली की ठाकरे साहेबाला भेटला, रडला, म्हणून त्याला पास केले. मला हे सहन झाले नाही. शास्त्रीबुवांनी गनियनच्या आभारप्रदर्शनाच्या सभेत मुलाखतीची हकिकत सांगून टवाळांची तोंडे बंद केली. मॅट्रिकमध्ये आमचा प्रवेश झाला.
माळव्याचा आमांश भोवला
इतक्यात मला आमांशाचा आजार झाला. थोरले मामा सखारामपंत छोटया पातीत, माझे वर्गबंधू डॉ. आनंदराव अमृतराव बाबर यांच्या घरात बिऱ्हाडाने रहात होते. त्यांनी मला तेथे नेले. रोग जोरावत चालला. माळव्यातल्या आमांश कोकण्यांना सहन होत नाही म्हणतात. डॉक्टरी इलाज हटले, केस बिघडत चालली. तेव्हा सखाराम मामांनी झाबुव्याला पत्र लिहिले आणि पनवेलीलाही वडलाना कळविले. बाबांनी देवासला येत आहे. अशी मला तार पाठविली. राजाराम मामाही राजीनामा देऊन यायला निघाले. या अवधीत इंदोरला प्लेग चालू झाला आणि तेथे येणारा प्रत्येक प्रवासी क्वारंटाइनमध्ये कोंबला जात असल्याच्या बातम्या आल्या सखाराम मामांची बायको आजारी पडली म्हणून माहेरी पोचवायला ते निघून गेले.
राजाराम मामांचा अजून पत्ताही नाही मी एकटा पडलेला आता काय करावे बाबा इंदोरमध्ये आले तर ते क्वारंटाइनमध्ये लटकणार पंधरा दिवस उज्जैनकडून आले तर काही घरे देवासलाही क्वारंटाइन होती पण तेथले पहाता येईल. पण प्रवासात असलेल्या बाबांना या सूचना द्यायच्या कशा नि कोणी? आजाराने माझी हाडे काढली होती. जागचे हालवतही नव्हते पण केला हिय्या नि साजेचा काळोख पडल्यावर तसाच उठलो नि. गावाच्या बाहेर बाहेरून हळूहळू कण्हत कुचत गेलो एकदाचा तार हापिसात प्रधान मास्तराना अडचण सांगितली. त्यांनी तात्काळ इंदोर रेल्वे स्टेशनवर ओळखीच्या मास्तरांना तारेने सूचना दिल्या. त्याप्रमाणे त्यांनी बाबांना हुडकून उज्जैनला रवाना केले. तसाच घरी परत येतो तोच राजाराम मामाही परतल्याचे कळले. नि. ते मला दत्तमंदिरात घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी बाबा देवासच्या क्वारंटाइनमध्ये आल्याचा त्यांचा निरोप आला. मामा धावले नि त्यांना सोडवून आणले. दोनतीन दिवसांनी आम्ही बापलेक सगळ्यांचा निरोप घेऊन उज्जैनमार्गे बी. बी. रेल्वेने मुंबईला येऊन पनवेलला दाखल झालो.
देवासचे दोन चिरस्मरणीय प्रसाद
माझ्या देवासच्या वास्तव्यात मला चिरस्मरणीय असे दोन प्रसाद लाभले. त्यांनी माझ्या जीवनाची आध्यात्मिक घडी बसविली. पहिला प्रसाद म्हणजे देवास राजधानीचे नि त्या शहराचे भव्य भूषण ती देवीची टेकडी आणि योगींद्र श्रीशीलनाथ महाराज यांचा मला पडलेला सहवास:
मुंबई-आग्रा रोडवर शहराच्या अगदी नजीक असलेली देवीची टेकडी म्हणजे देवासकरांच्या सकाळ संध्याकाळ सहलीचे ठिकाण आम्ही शाळकरी विद्यार्थी तर दररोज त्या टेकडीवर शाळा सुटल्यावर हमखास फिरायला जायचे. टेकडीवर जायला यायला प्रशस्त पुणे-पर्वतीछाप पायऱ्या आहेत. काहीजण प्रथम टेकडीच्या दुसऱ्या बाजूने डोंगराळी वाटेने चढून पलीकडे, जायचे आणि पायऱ्यांनी उतरायचे टेकडीवर देवीची दोन लेणेवजा खोदलेली मंदिरे आहेत. थोरली बहीण आणि धाकटी बहीण थोरलीची मूर्ती लहान पण टेकडीपलिकडच्या धाकटीची मूर्ती मात्र प्रचंड आणि रेखीव दर्शनाला गेले की कितीतरी वेळ तिच्याकडे एकाग्र पहातच बसावेसे वाटते शेजारी पाण्याचे टाके.
नवरात्रात तर देवीच्या शृंगाराचा थाट नि तेथली रोषणाई, पूजाअर्चा, आरती, भक्तजनांची अखंड दाटी दि वर्दळ तशात पवार राजघराण्याची ती कुलदेवता, सारे राजवैभव देवीच्या चरणाशी ओसंडून जायचे. कृष्णराव बाबासाहेब पवारांच्या कारकीर्दीत मी हा देवीचा नवरात्र महोत्सव दहाही दिवस सांज- सकाळ पाहिलेला होताच (सन १८९२) आणि त्यानंतर तर काय, सन १९०० ते १९०२ पर्यंत शिक्षणासाठी माझे वास्तव्य तेथेच होते. त्यानंतरही १९२० साली आणि १९३६ साली व्यवसायानिमित्त मी देवासला गेलो असताना. देवीच्या दर्शनाला जायला चुकलो नाही. अलिकडे बरीच वर्षे मी मुंबईला आहे, तरी नवरात्र आले की मनोमन मी त्या देवीची मूर्ती आठवून किचित्काळ तल्लीन होतोच होतो.
श्री शीलनाथ महाराजांची धुणी
धाकटया देवीच्या बाजूला टेकडीच्या खाली पण थोडयाशा उंचीवरच्या सपाटीवर श्रीशीलनाथ महाराजांची धुणी होती धुणी सारखी पेटलेली मोठमोठे ओंडके तीत जळत असायचे. महाराज त्या धुणीजवळ अखंड बसलेने असायचे. तुम्हाआम्हाला तेथे फार वेळ बसवायचेच नाही. इतकी धुणीची धग असायची. माथ्यावर कसलेही छप्पर नाही, कसलाही निवारा नाही. उन्हाळयाचे कडक ऊन भडकलेले असो. पावसाळ्यात मुसळधार पाऊस कोसळो विजांचा कडकडाट होवो, महाराज बसल्या जागी कायम पहाटे उठून बाहेर जायचे नि मस्तकावरच्या विशाल जटाभारातून पाणी निथळत आहे. अशा थाटात स्वारी एकदा भुणीजवळ येऊन ठाण मांडून बसली का बसली धुणीतली ठिणगी डोळयात जाऊन त्यांचा एक डोळा निकामी झालेला होता. सकाळ संध्याकाळ त्याचे तीनचार शिष्य आरती करायचे, काही मंडळी दर्शनाला यायची. फळफळावळ, मेवामिठाईची ताटे आणायची पण महाराज सगळ्यांकडे नुसते लुकुलुकू पहायचे.
क्वचित कोणाशी बोलले तर दोन मोजके शब्द बोलायचे. फार तर स्मितहास्य करायचे, भक्तजनांनी आणलेली प्रसादाची ताटे कोणाला तरी सांगून वाटून टाकायची. नमस्कार फक्त धुणीला करायचा. रात्री भजन व्हायचे. आम्ही विद्यार्थी आरतीला खाली जायचे. दर्शनच्या दर्शन आणि मेवामिठायीचा भरपूर प्रसाद मिळायचा. देवास येथील नागरिक, पुढारी आणि मैजिस्ट्रेट कै. बळवंतराव बिडवाई महाराजांचे निष्ठावंत भक्त होते. धगधगीत धुणीपुढे महाराज सारखे उन्हातान्हात उघड्यावर बसलेले, तर आपण त्याच्यासाठी टेकडीत भुयारासारखी एक गुफा बांधून द्यावी, अशी मनीषा त्यांनी अनेकवेळा महाराजांना सांगितली, पण "हठयोग चालला आहेना? त्याला गुंफा कशाला?" असे म्हणून वरचेवर महाराज नाकारीत. पण बळवंतरावांनीही आपला हेका चालूच ठेवला. अखेर, "अच्छा, बांधायची असेल तर बांधा बापडे" असा किंचित होकार मिळताच बळवंतरावांनी नामांकित कारागीर आणवून, टेकडीच्या पोटात एक सुंदर भुयारी गुफा तयार केली. तिचे प्रवेशद्वार दिंडीदरवाजाएवढे आत गेल्यावर प्रशस्त असा एक हॉल. शेजारीच देवघरासारख्या छोटया खोलीत शंकराची पिंडी हवा थंडगार (मी एकदाच आत गेलो होतो. आठवते तेवढे सांगतो.) हे.
गुफा बांधली, महाराज पहातच होते. पण ते काही आत जाऊन बसत ना. अखेर खूप याचना केल्यावर एकदा आणि फक्त एकदाच ते बळवंतरावादी मंडळींबरोबर आत फेरफटका करून आले. पुन्हा आपले ठाण बाहेरच मात्र गुफेच्या कामगिरीबद्दल बळवंतराव बिडवाईंना शाबासकी भरपूर दिली. कधीमधी महाराज धुणीची व्यवस्था शिष्यांकडे सोपवून, कुठेतरी निघून जायचे आठआठ-पंधरापंधरा दिवस. मग कधी ग्वालेरहून कधी बनारसहून तर कधी हृषीकेशहून तार यायची की महाराज येथे आले आहेत. सारा प्रवास पायी, महाराज पक्के उंचेपुरे. एकदा चालायला लागले की हां हां म्हणता नजरेपार जायचे. आगगाडीतून किंवा कसल्याही वाहनांतून प्रवास करताना महाराजांना कोणी पाहिलेले नाही.
बहुतेक रोज संध्याकाळी मीही इतरांबरोबर धुणीजवळ जाऊन बसायचा. कधीमधी महाराज माझी चौकशीही करायचे, शिवाय मी राजारामपंतांचा नातू म्हणून लवकरच त्यांच्या ओळखीचा झालो. कारण मामाही त्यांच्या दर्शनाला वरचेवर जायचे.
सन १९२० सालातले अखेरचे दर्शन
या वर्षी रावबहादूर बाळकृष्ण विनायक ऊर्फ बाळासाहेब समर्थ देवास छोटया पातीचे दिवाण होते. त्यांच्यासाठी देवास-इंदोर रस्त्यावर एक खास बंगला बांधलेला आहे. याला `समर्थ बंगला` असे अजूनही ओळखतात त्यावेळी धाकट्या पातीत एक विलक्षण राजकारण शिजू घातले होते. बरेच दिवस देवासबाहेरचे अनेक नामांकित वकील मल्हारराव बाबासाहेबांच्या चंदेरी मलिद्यावर मोकाट चरत होते. काय असेल ते असो, अचानक मल्हारराव महाराजांना माझी आठवण झाली आणि समर्थाना सांगून त्यांनी मला देवासला येण्याचे तारेने आमंत्रण दिले. माझे दादरचे एक स्नेही के. शंकर सीताराम ऊर्फ बाबूराव बेंद्रे यांना बरोबर घेऊन मी तातडीने देवासला गेलो. त्या विशेष राजकारणाचा निकाली फडशा पाडायचा होता. दोनतीन दिवस समर्थ महाराज आणि मी यांच्या खास गुप्त बैठकी होत होत्या. राजकारणाच्या फंदामागे लागण्यात काही अर्थ नाही, असा निकाल झाला.
श्री शीलनाथांचा राजयोग
हठयोगाची कडक तपश्चर्या पूर्ण झाल्यावर श्रीशीलनाथ महाराज यांचा राजयोग सुरू झालेला होता. म्हणजे बदल काय झाला? तर त्यांचे एकनिष्ठ शिष्य मल्हारराव बाबासाहेब पवार यांनी त्यांना आपल्या मल्हारगंज कॉलनीत एका प्रशस्त माडीवर वसतीला नेले. अंगणात धुणी होती. श्रीशीलनाथ महाराजांना बसायला एक लोखंडी कॉट, त्यावर गादीचे लेपडे नि स्वच्छ पांढरी चादर टेकायला मागे एक लोड, जटाभार उतरलेला. झाला राजयोगाचा थाट, कॉटवरसुद्धा महाराज लोडाला न टेकता बसायचे,
श्री शीलनाथांच्या अनेक साक्षात्कारांमुळे बाळासाहेब समर्थ त्यांचे अनन्य भक्त झालेले होते. दररोज पहाटे नि सायंकाळी धुणीच्या आरतीच्या वेळी ते सहकुटुंब दर्शनाला जात असत आम्हा दोघांना साहजिकच दर्शनाचा लाभ व्हायचा. पहिल्याच भेटीला महाराजांना मी आपली जुनी ओळख दिली आणि हां हां, धुणीपर परशादी बाटनेवाले ना?" अशी त्यांनीही खूण पटवली समर्थ, मल्हारराव आणि आम्ही दोघे नित्य काही ना काही विषयावर महाराजांबरोबर चर्चा करायचे त्यांची भाषा हिंदी गुरुमुखीच्या मिश्रणाची असावी. पण समजायला अडचण पडत नसे.
चिडियोंकू हिंदू बनानेवाला वैद्य
देवासला गेलो की व्हिक्टोरिया हायस्कूलात व्याख्यान ठरलेले. छोटया पातीच्या लायब्ररीतही माझे एक व्याख्यान ठरले. विषय होता" हिंदू मिशनरी चळवळ . व्याख्यानाला माझे सारे वंदनीय गुरुजी, स्नेही मंडळी आणि नागरिक यांची गर्दी झाली. त्यावेळी म्हैसूरची एक शास्त्री नावाचा ज्योतिषी मल्हारराव पवारांना चिकटलेला होता. त्याला घेऊन ते सभेला आले आणि अध्यक्ष म्हणून त्यांनीच त्याचे नाव सुचविले. मी चांगले तास दीडतास भाषण केले. श्रोत्यांना ते फार आवडले, पण त्या अध्यक्ष शास्त्रीमहाशयांनी नाक फेंदारले अध्यक्षीय भाषणात त्यांनी हिंदू मिशनरीची मनस्वी निंदा टवाळी केली. "बंबईमे कोई गजानन वैद्य नामका एक आदमी पैदा हुवा है, यो चिडियोंकूमि हिंदू बनाना चाहता है. यह सब भ्रष्टाचार है." असे अद्वातद्वा बोलत सुटला. तो खाली बसताच मी ताडकन उठलो आणि पुन्हा त्याची विधाने खोडण्यासाठी तडाखेबंद भाषण करू लागलो. त्याने मला प्रतिकार करताच "तुम्हाला माझे भाषण ऐकायचे नसेल तर व्हा चालते इथून " असे खडसावताच रागारागाने तो निघून गेला, मल्हारराव महाराज बसूनच राहिले. आणखी एक तास माझे भाषण झाले, सर्वांना आवडले. त्यांनी त्या शास्त्र्याची निंदा केली. गावभर या बंडखोर व्याख्यानाचा गवगवा झाला.
सदसद्विवेकबुद्धीशी प्रतारणा मुळीच नको
दुसरे दिवशी मी आणि केंद्रे मुंबईला परतणार होतो. सकाळीच श्रीशीलनाथ महाराजांच्या दर्शनाला गेलो. बसतो तोच मल्हारराव बाबासाहेबही आले. कालच्या व्याख्यानाची भानगड श्रीशीलनाथजीनाही समजली होती मल्हाररावांना पहाताच ते हसत हसत म्हणाले, "खूप किया मल्हारजी (आमच्याकडे पहात) कलकी सब शोर यह महाराजने जान बुजके बनायी, वो शास्त्री है जूना पुराना मतवाला ठाकरे खुल्ललुला नवमतवादी काहेको आपने उस्को सभापती बनाया जी? यह आपकी ही गलती है." आम्ही सगळेजण खूप हसलो.
मी आम्ही आज सायंकाळी मुंबईला जाणार महाराज. आपला आशीर्वाद असावा.
श्रीशीलनाथ ठाकरेजी, आशीर्वाद तर आहेच. पण एक तत्व लक्षात ठेवा. आपण जनताभिमुख लेखक वक्ते आहात. सदसद्विवेकबुद्धीशी लवमात्र प्रतारणा न करता. जे मनाला पटेल तेच लिहावे नि बोलावे. इतर कोणी काहीही म्हणोत, त्याची पर्वा करण्याचे कारण नाही.
हा संदेश शिरोधार्य मानून आम्ही निरोप घेतला. त्यानंतर थोडयाच दिवसानी श्रीशीलनाथ महाराजानी हृषीकेश येथे समाधी घेतल्याचे समर्थांचे पत्र आले.
प्रकरण ६
मागच्या सहासात वर्षातल्या विविध भूमिका
देवासहून परत आल्यावर (सन १९०२) पुढील सहा-सात वर्षांत शिक्षणासाठी आणि (थोड्याच दिवसात वडील वारल्यामुळे) दहा-बारा माणसांच्या कौटुंबिक निर्वाहासाठी, व्यवसायांच्या धडपडीच्या आणि यत्नसाहसांच्या अनेक, विविध क्षेत्रांत मी किती कसकशा उड्या मारल्या, यांची यादी बरीच लांबलचक आहे. अगदी बहुरुप्याच बनावे लागले म्हणाना. वाटेल ते करून आपण मैट्रिक व्हावे आणि तत्कालीन डिस्ट्रिक्ट प्लीडरची परीक्षा देऊन जिल्ह्यात वकिली करावी, यापेक्षा त्याकाळच्या माझ्यासारख्या बिकट अवस्थेतील उमेदवार तरुणापुढे आणखी जाडीभरडी महत्त्वाकांक्षा ती काय असणार? पण योगायोग निराळे होते.
पुढे अभ्यास होणे शक्य दिसेना. मुंबईला जाऊन एखाद्या कंपनीत नोकरी तरी पत्करावी, असा विचार करणे भाग पडले. त्याकाळी कंपनीतली नोकरी हे एक शिक्षित तरुणांपुढे सहजसुलभ असे आकर्षक साधन असे. माझ्यापेक्षा अल्पशिक्षित असे कितीतरी लोक व्यापारी कंपन्यांत लागून दरमहा पंचवीस-तीस रुपये कमावीत असत. हा आकडा आजकालच्यांना क्षुद्र नि क्षुल्लक वाटल्याशिवाय रहाणार नाही. पण एका तरुणाला मुंबईला पंचवीस रु. ची नोकरी कंपनीत लागली की त्याचा हात गगनाला पोहोचल्यासारखे वाटायचे. आणि तसे का वाटू नये? रहायला कोणातरी नातलगाच्या बिऱ्हाडाची ओसरी लाभायची. खानावळीचा दर महिना अवघा सात साडेसात रुपये, साताला ताक आणि साडेसाताला दही. बस्स. बाकीचा बेत सगळ्यांना सारखा. दोन वेळच्या चहाला महिन्याचा १ रुपया पुरत असे. दिडकीला फुल कप, हापीस कोटात असायचे. जाताना फक्त टामरेलीचा आणा. परतताना मित्रमंडळीबरोबर गप्पाटप्पा मारीत वनटू-वन्टू करीत यायचे.
गावी घरी महिन्याला १० रुपये धाडले तरी चंगळ उडायची, गर्भश्रीमंती आल्याचा भास व्हायचा. पहिल्याच महिन्याला कमावत्या चिरंजीवांचा झोकनोक आरपार बदलायचा. मलमली धोतर, पायांत भुलेश्वरचा लालबुंद पुणेरी चटकफटक् जोडा, काळ्या आलपाकचा कोट, काळी मखमली टोपी, छातीभर इस्तरीचा शर्ट, त्याच्या कफांना दीडदोन आण्याची चकचकीत बटणे, घेराशेंडी जाऊन संजाब राखलेला. अशा थाटात नवी कोरी रंगीत ट्रंक घेऊन संजाब राखलेल्या थाटात आगबोटीने उलवामार्गे टांग्याने चिरंजीव रस्त्याने घरी जात असताना, साऱ्या गावकयांचे डोळे त्याच्या ममई थाटाला येऊन चिकटायचे. शेंडीला रजा देऊन संजाब राखल्यामुळे जुन्या बुद्रुकांत मात्र टीका टिपणी बरीच चालायची. तुमचा नातू बिघडला बरे, जानवे तरी ठेवलंय का नाही. देव जाणे वगैरे कागाळ्या घरपोच पावत्या व्हायच्या.
या सुमाराला वडलांनी खतपत्रे दस्तऐवज लिहिण्याचे एक दुकानच थाटले होते आणि त्यांना किफायत चांगली होत असे. हयातभर पंधरा रुपड्यांवर बेलिफी केली. पण आता मात्र दरमहा तीस-चाळीस रुपये सहज कमाई होत असल्यामुळे, त्यांनी खर्चाची हमी देऊन मुंबईला पाठविले. धसवाडीतले शेणव्याच्या चाळीतले फणश्यांचे बिऱ्हाडावरचा माळा आमचे छावणीस्थळ.
टाइम्सच्या डब्ल्यूचे आकर्षण
नोकरीसाठी आजूबाजूच्या गावातून कोणीही तरुण मुंबईला आला रे आला का त्याला अनुभवाच्या पहिला गुरुमंत्र बाबा रे सकाळी दररोज उठून टाइम्समधल्या `वॉण्टेड च्या जाहिराती पहात जा` पटकन त्याच्या पोटात क्रिकेटबॉलएवढा गोळा उठायचा. टाइम्सचा अंक त्याकाळी ४ आण्याला विकायचा मग हे त्रांगडे जमणार कसे? त्यावर गुरोऽवाच: अरे वेंधळ्या. सकाळी लवकर टाइम्सच्या हापिसात जायचे तेथे दरवाजावरच फुकट वाचण्यासाठी टाइम्सचा ताजा अंक ठेवलेला असतो. त्यातले दोन नंबरचे पान उघडायचे आणि साऱ्या डब्ल्यूवाल जाहिराती पहायच्या. आपल्या सोयीची वाटेल त्या नोकरीसाठी अर्ज लिहून तेथेच पोस्टाच्या पेटीसारखी टाइम्स कचेरीची पेटी आहे. तीत तो अर्ज टाकायचा. तिकीट बिकीट काही लावायचे नाही. फक्त पाकिटावर `टू द अॅडव्हरटायझर`, बॉक्स नं. अमुक अमुक, बॉम्बे बस्स एवढे लिहून टाकायचे. समजले?
आता ते टाइम्सचे हापीस आहे तरी कुठं? त्याचा शोध, गुरुवर्य एक दिवस स्वतः ते त्याला दाखवायचे. बिचारा टाइम्सच्या ओसरीवर पाऊल ठेवतो न ठेवतो, तो काय? त्या अंकावर डझनभर टाळकी चिकटलेली. सगळेच लेकाचे वॉण्टेडवाले क्यू ची कल्पना कोणालाच नाही. काहीतरी घुसडाघुसड करून आपले टाळके एकदाचे त्या डब्ल्यूच्या पानावर घासायचे. नंबर लिहून घ्यायचा आणि घरी येऊन अर्ज लिहून परत फुकटात टाकायला टाइम्स मंदिरात जायचे. तंगडतोडीचा मामलाच तो त्यावर इलाज काय? तर म्हणे, फावल्या वेळात अर्जाच्या बऱ्याच नकला करून ठेवायच्या, फक्त बॉक्स नंबर लिहायचा नाही. तो पाहिल्यावर तेथच्या तेथे लिहून पेटीत टाकायचा, सोपी युगत, फावल्या वेळेला हो काय तोटा? बापाकडून खर्चाचे पैसे यायचे. सकाळची टाइम्स यात्रा झाली का फुरसदच फुरसद बसलाय लेकाचा अर्जाच्या नकला खरडीत.
मी या प्रपंचात एकदाच पडलो. आणि केली एक घोडचूक टाइम्सच्या पेटीत पाकीट टाकण्याऐवजी शेजारीच खास टाइम्ससाठी चालू असलेले खरे पोस्ट होते. त्या पेटीत टाकले. नाटपीट पत्र कोण आमचा काका घेणार ? ते झाले रिफ्यूज्ड नि आले आमचा शोध करीत पोलिसी कुत्र्यासारखे वाटले, आला बरं का पहिल्या तडाक्यालाच नोकरीचा कॉल. पहातो तो काय? दोन आणे दंड भरायचा स्तंभमानवाचा (पोस्टमनाचा) हुकूम. कानाला खडा लावला. आपल्याला हे डब्ल्यूचे तंत्र धार्जिणे नाही. आपण आपले याच्या ना त्याच्यामार्फत नोकरीचा सुगावा काढावा हे बरे. एक दिवस देव पावला.
अहो, पावणेआठ काय देता?
एक दिवस एका शाळामास्तरने मला एका गावठी शाळेत मास्तरकी करण्याचे निमंत्रण दिले. त्याकाळी व्ह. पा. झालेल्या अनेकांनी खासगी प्राथमिक शाळा गल्लोगल्ली चालविलेल्या होत्या. त्यांना म्युनिसिपालिटीकडून काही वार्षिक ग्राण्ट मिळायची. खेतवाडीतल्या एका शाळेत इंग्रेजी पहिल्या यत्तेला इंग्रेजी शिकवण्याची नोकरी आम्हाला मिळाली. बैठेसे बिगार भली, निदान खानावळ तरी सुटेल, पगार किती? तर म्हणे पावणेआठ रुपये. दोनतीन तासांची नोकरी खरी, पण पगार पावणेआठ कसला? पुरे आठ देता येत नसतील तर निदान साडेसात करा. चालेल मला. पण पावणेआठ पगार मिळतो. सांगायचे कसे कुणाला? तर म्हणे, `ते अऽमच्या हिशेबात बसत नाही ना?`
इतक्यात माझा धाकटा भाऊ यशवंत पनवेलला पाचवी यत्ता झाला. आली का पुन्हा तीच अडचण त्याच्या पुढच्या शिक्षणाची वडलांनी त्याला माझ्याकडे मुंबईला धाडले. आला का आता प्रश्न दोन पोटांचा? घरी खंडणी पाठवायचा प्रश्न नव्हता, तरीही दोघांची खानावळ आणि शाळेच्या फीचे काय करायचे? पण तेही त्रांगडे निपटले. रॉबर्ट मनी हायस्कूलात यशवंतला दरमहा पाच रुपये स्कॉलरशिप आणि फी माफीची सवलत मिळाली. खानावळीच्या नादाला न लागता आम्ही फणश्यांच्या बिऱ्हाडाच्या वरील माळ्यावर दळवी बंधू रहात होते. तेथे भाड्याची भागीदारी पत्करुन स्वतंत्र चूलच मांडली.
पाकशास्त्रात मला तरी काहीच कळत नव्हते. पण यशवंत थोडेथोडे जाणत होता. कसेबसे चालत असे. वडिलांकडूनही महिन्याला थोडे पैसे यायचे. पहिल्या शाळेतल्या मास्तरकीच्या जोडीला, नॉर्थबुक गार्डनच्या बाजूला असलेल्या आणखी एका गावठी शाळाचालकाने इंग्रेजी शिकवण्यासाठी एक तासभर कामाचे रु. पाच ठरवले. म्हणजे आता निदान पावणेतेरा रुपये पगार सांगायला हरकत वाटायची नाही. पावणेआठ सांगताना चित्ताचे अगदी तीनतेरा उडायचे पगार काही का मिळेना. आपण मात्र ठोकून फुगलेला आकडा सांगावा, असा अनेकजण उपदेश करीत, पण मी मात्र तसल्या खोटारडा थापेबाजीचा आसरा कधीच घेतला नाही माझा तो स्वभावच नव्हे.
स्वतंत्र धंद्याचे निरीक्षण परीक्षण
मास्तरकी करीत असताना मुंबईभर अनेक लहानमोठे उद्योग करून कितीतरी लोक इभ्रतीने उदरनिर्वाह करताना सभोवार दिसायचे. नावाच्या पाटया रंगविणारे काय मॅट्रिक आहेत? धड वर्तमानपत्रही कधी वाचीत नाहीत ते अक्षरे मात्र वळणदार काय? मला हा धंदा करता येणार नाही? आलाच पाहिजे मग ही मास्तरकीची महारकी हवीच कशाला? त्या पंथाचे तंत्र मी नीट अभ्यासले त्याचप्रमाणे वुडकट एग्रेव्हींगची कलाही मी रेळे कंपनीचे पी. पी. रेळे यांच्याकडून शिकून घेतली. दोन्ही धंद्यांचे थोडेथोडे साहित्य आणून नमुने तयार करू लागलो. याशिवाय माझा लेखन वाचन व्यासंग तर सारखा चालूच होता. झावबावाडीच्या समोरच यंदेशेटचा इंदुप्रकाश छापखाना होता. तेथेही त्यांना भेटून इंदुप्रकाशासाठी काही किरकोळ मनोरंजक विषयांची टिपणे देण्याचा उद्योग ठेवला होता. पण लेखनावर दमड्या मिळतात हे सूत्र मात्र तेव्हा माझ्या कानात नि मनातही घुसलेले नव्हते. नि कोणी घुसविलेही नव्हते. घुसवणार कोण? सगळेच कंपनीतले नोकरमाने आज साहेब असा बोलला नि मी त्याला असे उत्तर दिले याच त्यांच्या रात्रंदिवस गप्पा.
दैव्यमन्यत्र चितयेत्!
विद्यार्जनाची निराशा होऊन मुंबईला आम्ही दोघे भाऊ पडेल तो व्यवसाय करीत असतानाच, एक दिवस वडील पनवेलीहून आमची हालहवाल पहाण्यासाठी मुंबईला आले. खानावळीची व्यवस्था लावली. खर्चाला पैसे दिले, त्याच वेळी पनवेलीला प्लेगचे उंदीर मरू लागले होते. "खजिन्यावर आपली झोपडी उभारली आहे. परवाची संक्रात घरी उरकून आम्ही तिकडे बाहेर रहायला जाऊ. संक्रातीला येणार आहात का तुम्ही? तसं म्हटलं तर आहे काय त्या एका दिवसाच्या सणात? उगाच इकडच्या खटपटीत अडथळा" असे बाबा म्हणाले यशवंत दोनतीन दिवसांसाठी त्यांच्याबरोबर निघाला. शाळकरी विद्यार्थीय तो. मी जाणार नव्हतो.
दादीशेठ आग्यारी लेनमध्ये एका डॉक्टरच्या बिऱ्हाडी त्यावेळी पनवेलचे फौजदार रामचंद्र धनाजी जाधव यांचा अठराएकोणीस वर्षाचा मुलगा भाऊराव अभ्यासाला रहात असे. त्यांच्याकडे माझे रोज जाणेयेणे असे. त्यांच्याकडे फणसवाडी कोळीवाडीत राहणारे ज्योतिषी भिकंमट अग्निहोत्री या शुचिर्भूत नेहमी जाणेयेणे असे. माझीही चांगली ओळख झालेली होती. मी आणि भाऊराव संक्रातीसाठी पनवेलला जाणार नव्हतो, हे ऐकून भिकंभट म्हणाले, "छे छे. असं करू नका. अहो. संक्रातीसारखा महान क्रांतिकारी दिवस, सगळ्या कुटुंबियांनी एक दिवस तरी आपल्या घरी असलंच पाहिजे, तुम्ही अगत्य जा. तसा माझा आग्रह आहे.
पनवेलला जाणे म्हणजे काय विलायत अमेरिकेला जाणे नव्हे. पाऊल उचलायचे नि चालायला लागायचे. आम्ही दोघे संक्रातीच्या दोन दिवस आधी, म्हणजे भिकंभटाचा इषारा मिळाला त्याच दिवशी दुपारी चांभारगोदीतून नव्याने निघालो. समा होता आणि वारा अनुकूल होता. मग हो काय? मचवा तिरासारखा फोफावत निघाला तो सूर्यास्ताच्या आधी दिवसाउजेडी थेट पनवेलच्या बंदराला लागला. कोर्टात कामाला आलेले वडील बंदरावरच भेटले. "हात्तेच्या. आलातच का अखेरीला? ठीक ठीक." आम्ही तिघे बरोबर पोचलो. घरातल्या मंडळींनाही आनंद झाला.
गाव बहुतेक उठून बाहेर गेला होता. आजोळकर पत्कीही गेले होते. फौजदारांचे बिऱ्हाड जव्हारकरांच्या घरात असल्यामुळे, ते किंचित गावाबाहेर असल्यासारखेच होते. भाऊ जाधवाने घरात पाऊल टाकले तोच त्याला फणफणून ताप भरला जांघेत गाठही आली. औषोधोपचाराची गडबड उडाली. बिचारा माझ्याबरोबर हसत खिदळत सणासाठी घरी येतो काय नि तास दोन तासाच्या आत प्लेगाने पछाडला जातो काय? सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आणि आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी भाऊ जाधव मृत्युमुखी पडला.
त्याच्या स्मशानयात्रेहून वडील दहा वाजता आले पहाटेचा सुमाराला ते कण्हत असल्याचा कानोसा घेताच मी बिछान्यातून ताडकन उठलो. ताप फणाणलेला. ताबडतोब जितके उपचार सुचले तितके ताईने (मातोश्रीने) केले. उजाडताच मी गौरुशेट डॉक्टराकडे धावलो. त्यांचे उपचार चालू झाले. तो संक्रातीचा दिवस, उपचार कसले नि काय कसले! ज्या गृहस्थाला हयातीत मी कधी थेट्या पडश्याने आजारी पडल्याचे पाहिले नव्हते, तो धट्टाकट्टा असामी त्याच दिवशी सायंकाळी कालवश झाला. कुटुंबाचा पोशिंदाच नाहीसा झाल्यावर.
आता पुढे कसे नि काय?
लहानसान भावंडे धरून दहाबारांचे कुटुंब. तात्यांच्या सव्वासात रुपये पेन्शनीत भागणार कसे? बरं, आता हाय खाऊनही उपयोग नाही नि तो माझा स्वभावच नाही. यशवंतला मुंबईलाच ठेवला आणि मी घरी पनवेलीलाच ठाण मांडले. मॅट्रिक होऊन वकिलीची परीक्षा दिलीच पाहिजे. त्यासाठी पडतील त्या उलाढाली करण्याचा निश्चय मी केला. पण त्याच वेळी कुटुंब पोषणाची जबाबदारीही मला पार पाडायची होती. म्हटलं आता पांढरपेशेपणा झुगारला पाहिजे. मनगट घासून काहीतरी उद्योग काढला पाहिजे आणि तो करीत असताना अभ्यास चालू ठेवला पाहिजे.
पांढरपेशेपणा सोडलाच पाहिजे
वडलांचा मृत्यू होताच आम्ही गावाबाहेर हौदाच्या मैदानावर झोपडीत रहायला गेलो. तेरा दिवसही पुरे झाले असतील नसतील तोच एक दिवस फौजदार मला भेटले. ते म्हणाले-हे पहा केशव, तुझ्या वडलांनी घोड्याच्या टांग्यावरील नंबराच्या पाट्या रंगविण्याचे कंत्राट घेतले होते. आता कसे काय करणार? ते आता दुसऱ्या कोणाला तरी द्यावे लागणार, मी ते का म्हणून? मी ते पुरे करीन. नाहीतरी ते काम मीच उरकणार होतो. फौजदारांनी ते कबूल केले. गावात प्लेग चालूच होता. टांग्याच्या चाकांवर दोन्ही बाजूला उतरत्या फळ्या असायच्या. त्यावर पनवेल ते उलवा. टांग्याचा क्रमांक मोठया अक्षरात. फक्त चार पासिंजर भाडे प्रत्येकी फक्त चार आणे. अशी इंग्रेजी मराठी अक्षरे रंगवायची. त्याचे मी दोन स्टेन्सिलच तयार केले.
दररोज सकाळी यशवंत आणि दत्तू (चुलतभाऊ) यांनी चारी बाजूला ठराविक आकारात काळा रंग मारून ठेवायचा सातआठ टांग्यावर दुपारी चार वाजता मी जाऊन अक्षरे रंगविण्याचे काम पुरे करायचा. हे सारे काम मामलतदार कचेरीच्या आवारात चालायचे. या कामाचा दर टांग्याच्या रंगवणीचा रुपये दोन तो फौजदार कचेरीतून जेव्हाच्या तेव्हा हातात पडायचा. सातआठ दिवस तिघा भावांनी श्रमून ते कंत्राट पुरे केले. खर्चवेज वजा जाता पन्नाससाठ रुपये कमाई पदरी पडली. ठाकऱ्यांची पोरे बापाचे सुतक बितक न पाळता फौजदार कचेरीत टांग्यांच्या पाट्या रंगवताहेत. या भुमकेने आमच्या भोवती गावकरी बघ्यांची रोज गर्दी व्हायची. बरोबरच आहे. पांढरपेश्यांनी किंवा त्यांच्या मुलांनी असला हलका पेण्टरचा धंदा केल्याचे. कुणी आजवर पाहिले आहे? छे छे लेकाचे घरात उपाशी मरतील. पण काही धंदा? रामा शिवा गोविंदा.
अडीच आणे कुठून आणलेस?
माझ्या अठराव्या वर्षी वडील वारले. लहानथोर दहाबारा माणसांची जबाबदारी माझ्यावर पडली. आजोबांच्या सात रुपये पेन्शनीत भागणार ते काय? मोठ्या विवंचनेचा काळ तो! असाच विचार करीत ओटीवर बसलो होतो. इतक्यात माळ्यावर उंदीर धरणाऱ्या मांजराचा धडपडाट झाला. माळा होता साध्या कारवीचा. भसाडदिशी माझ्या पुढ्यांत वरून काही कचरा आणि त्यात एक लहानसे हस्तिदंती मुठीचे चाकूचे छोटे पाते पडले. मोठे आकर्षक होते ते. मी चटदिशी ते उचलले नि पात्याला तेल लावून ते चकचकीत केले. जवळच पुस्तके चोपडाच्या धोपटीत रबराचा एक तुकडा होता. त्यावर हलकेच चालवून पाहिले. फार छान काट घेत होते ते. यावर एक कल्पना सुचली आणि दुसऱ्या नव्या कोऱ्या रबराच्या वडीवर मी शाईने माझ्या नावाची (रबरस्टांपासारखी) उलटी अक्षरे लिहिली आणि ती त्या पातीने कोरण्याचा यत्न केला.
तो काय? उत्कृष्ट रबरस्टांप तयार झाला. माझे अक्षर मुळातच वळणदार पुसत्या घटवताना शाळेत मास्तरांच्या छड्या खाल्लेल्या होत्या ना सपाटून त्या स्टांपाला जांभळी शाई लावून कागदावर अनेक नमुने तयार केले. इतक्यात माझा एक शाळकरी मित्र विनायक धोंडदेव जोशी आला. त्याने ते पाहिले नि "मला दे रे असाच स्टांप करून माझ्या नावाचा" म्हणाला. माझ्या डोक्यात किंचित व्यापार फुरफुरला. रबराची वडी दोन पैसे आणि करणावळ दोन आणे मिळून जोश्याजवळ मी अडीच आणे भाव ठरवला. त्याला अवघ्या तासाच्या आत शिक्का कोरून लाकडावर बसवून स्टांपाचे पेंड शाईसगट दिले नि अडीच आणे घेतले, ते ताईजवळ देताना, ती गरजली, "कुठून आले हे अडीच आणे?" मी सर्व सांगितल्यावर ते तिने घेतले. इतकेच नव्हे तर. "अरे हे तुला चांगलेच साधले म्हणायचे. मग सध्या हाच उद्योग जमतो का काय ते पहा ना." असे तिने उत्तेजन दिले.
आणि तो दोनचार दिवसांत जमलाही. कारण जोश्याचा शिक्का पाहून एका तलाठ्याची ऑर्डर आली. तिचा भाव ठरला एक रुपया. तलाठ्यामागून वकील येत गेले. अखेर खुद्द मामलतदार आणि रजिस्टार कचेरीतल्या अनेक रबरी स्टांपाच्या ऑर्डरी मिळत गेल्या. दरमहा चांगले पंधरावीस रुपये कमाई होऊ लागली. स्टांपाची शाई, पॅड्स, शिक्क्यांचे काळे कातीव खुंट वगैरे साहित्य भराभर जमत गेले. खुंट तेवढे कातकऱ्याकडून करवून घ्यायचे, बाकी साहित्य होम इंडस्ट्री
चार महिन्यांनी प्लेग हटला. लोक गावात आले. आम्ही आलो. पुढचा विचार काय?
ठाकरे ब्रदर्स,
रबरस्टॅप मेकर्स
साईनबोर्ड पेण्टर्स अॅण्ड बुक बाइंडर्स
अशी काचेवर रंगविलेली नखरेल फ्रेम केलेली पाटी घरावर लावली. रबरस्टॅपचे नमुने बरोबर घेऊन वकील, डॉक्टर, फार काय मामलतदार, मुनसफांच्याही बिऱ्हाडी भेट घेऊ लागले. पनवेलीत वकील डॉक्टरांच्या नावांच्या पाट्या लावण्याची फॅशन नव्हती ती मी चालू केली. मामलतदार मुनसफांच्या दारांवर पाट्या लागताच वकिलानाही स्फुरण चढले. डॉ. गौरुशेटचा दवाखाना तर भर बाजारात त्यांच्या नावाची एक मोठी पाटी रंगवून त्यांना नजर केली. तिचा जाहिरातीसारखा चांगलाच उपयोग झाला. सहयांचे शिक्के कोरून देण्याच्या कलेने मामलतदारांच्या कचेरीत प्रवेश मिळाला. त्यांनी सगळे जुने झालेले सरकारी शिक्के करण्याचे कंत्राट दिले. झाले. रोजी दीडदोन रुपये कमाई होत गेली पनवेलच्या इंग्रेजी शाळेतल्या पुस्तकांचे बायडिंगचे काम मिळवले. दोनतीन महिन्यांतल्या उद्योगाने खर्चच वजा जाता आजीआईच्या हातात शंभर रुपये ठेवून, निर्वेध अभ्यासासाठी मी रावसाहेब समर्थ मुनसफ यांचेकडे बारामतीला गेलो. त्यानी मला आपलेपणानेच बोलावले होते.
जातीय संस्थांना कडवा अनुभव
कलकत्ता युनिवर्सिटीच्या एण्ट्रन्स (मॅट्रिक) परीक्षेच्या अभ्यासाला त्यावर्षी कोणती पुस्तके लागतात, याची माहिती माझे देवासकर मित्र डॉ. आनंदराव अमृतराव बाबर यांचेकडून मागविली. मी परीक्षेला बसणार हे आमचे प्रिन्सिपल शास्त्रीबुवांना कळताच, "तुझा देवासला येण्याजाण्याचा खर्च मी करीन" असे त्यांचे लिहून आले. पण पुस्तके कशी नि कुठून मिळवायची? कोणी सुचविले की माटुंग्याला चांद्रसेनीय कायस्थ प्रभू मध्यम शिक्षणोत्तेजक किंवा अशाच नावाची एक संस्था आहे. त्यांना अर्ज करावा. केला. "तुम्हाला जी पुस्तके हवीत त्यांची यादी पाठवा म्हणजे खरेदी करून ती पाठवून देऊ आणि परीक्षेची फी रु. दहा योग्य येळी पाठवू" असे त्यांचे उत्तर आले. यादी पाठवली. सुमारे दोन महिने स्मरणपत्रांचा वर्षाव केल्यावर एका दिवशी अंदाजे रु. बारा किंमतीची पुस्तके मला पुणे मुक्कामी समर्थांकडेच असताना मिळाली.
अभ्यास चालू झाला. परीक्षेला दीडदोन महिने उरले, मी पनवेलला परत आलो. टर्मिनल परीक्षेच्या सर्टिफिकीटासह कलकत्ता युनिवर्सिटीकडे अर्ज करायचा होता. त्यावेळी कै. बाळासाहेब समर्थ (रावसाहेबांचे पुतणे) दादर येथे हरेश्वर महादेव पंडितांच्या बंगल्यात (म्हणजे आज ज्या जागेवर म्यु. प्राथमिक शाळा कोहीनूर चौकात आहे तेथे रहात होते, त्याच्याकडे आलो. त्यांनी एलफिन्स्टन हायस्कूलच्या प्रिंसिपलला माझी परीक्षा घेऊन सर्टिफिकीट देण्याची विनंती केली. त्यांचे सर्टिफिकीट मिळाले. फॉर्म भरून कलकत्त्याला पाठविला. त्याचबरोबर माझ्या अवस्थेचे एक विनंतीपत्रही सोबत जोडले. अगदी शेवटच्या तारखेला जरी तुमची फीची रक्कम तारेने आली तरी ती स्वीकारून तुमचे परीक्षेचे इंदोर सेण्टर नक्की करण्यात येईल अशा आश्वासनाचे रजिस्ट्रारचे पत्र आले.
दिवसामागून दिवस जात होते. मांटुग्याच्या त्या जातीय संस्थेकडे स्मरणपत्रांवर स्मरणपत्रे मी सारखी पाठवीत होतो. एकाही पत्राची दाद लागेना. म्हणून रजिस्टर्ड पावतीचे तातडीचे पत्र पाठवले, तरीही ते माटुंग्याचे जातीय दगड हालेतच ना. प्रयत्नांचा एवढा पर्वत रचला नि आता अगदी ऐनवेळी करायचे काय? अभ्यासाचा पिच्छा पाडू का परीक्षेच्या फीसाठी दारोदर भिक्षा मागू? जातीय दगडधोंड्यांनी कपाळमोक्ष केला तर तेवढेही करणे भाग होते. पण प्रयत्नशीलाचे ते ब्रीद नव्हे.
माझ्या गरिबीचे निर्लज्ज प्रदर्शन
फॉर्म भरण्याची तारीख भराभर जवळ येत चालली आणि माटुंग्याचे ते मध्यम शिक्षणोत्तेजक स्वजातीय फत्तर जबाबच देत ना. अखेर पावली खिशात टाकून मुंबईला निघालो. भाजीच्या पाट्या भरलेल्या पडाववाल्याला एक आणा दिला का पहाटे ठेपी चांभारगोदीत मुंबईला हजर तेथून मशीद स्टेशन पायी, मशीद टू दादर अर्धा आणा. दीड आणा खलास झाला. दादर स्टेशनहून पायपिटी करीत, शोध घेत, माटुंग्याच्या पोष्टाच्या चाळीत गेलो. संस्थेचे सेक्रेटरी कोणी दोंदे नावाचे गृहस्थ होते. मी गेलो तेव्हा न्हावी त्यांचा घेरेदार गोटा करीत होता. पोष्टाची चाळ एक मजली. हे महाशय तळमजल्यावरच आढळले.
तळमजल्याचे जोते एक पुरुष उंच. पायरीजवळ खाली उभा राहून "अमुक संस्थेचे सेक्रेटरी दोंदे कुठे राहतात?" असे मी विचारताच, "काय काम आहे? मी पनवेलीहून ठाकरे आलो आहे" सांगताच त्याने फक्त हाताने थांबा" अशी खूण केली. म्हटले न्हावीबुवांच्या हातांतच मुंडके सापडल्यावर बिचारा मानव काय करणार? दोंद्यांचे चमन पुरे होईतोवर अर्धा तास मी पायरीजवळ खाली उभा होतो. पण वर येऊन बसा एवढेही सौजन्य त्या जण्टलमनाने मला दाखविले नाही. हजामत उरकली, न्हाव्याच्या हातून दोघांची हातीपायी सुटका झाली. स्वारी घरात आंघोळीला गेली. मी आपला तसाच उभा शेजारच्यांनी चौकशी केली नि या वर येऊन बसा सांगण्यापुरती माणुसकी दाखविली. दोंदे कपडे चढवून बाहेर आले. "चला माझ्याबरोबर. ते मला दळवी नावाच्या गृहस्थाच्या बिऱ्हाडी घेऊन गेले. दोंदे, दळवी आणि शेजारचाच एक गृहस्थ असे तिथे एकमेकांत काही ठरवून, मला घेऊन बाहेर पडले. एका गृहस्थाकडे" आम्ही गेलो.
दळवी : हा एक अनाथ विद्यार्थी आहे. मॅट्रिकच्या परीक्षेसाठी दहा रुपये फी भरायची आहे. आपण काही मदत करा. दहापाच घरे फिरून याची गरज भागवायाची आहे आपल्याला.
त्या गृहस्थाने एक रुपया दिला. त्यांना बाहेरच थांबवून मी कडाडलो- "काय हो, तुमची संस्था आहे ना? मग मला घेऊन असे घरोघर भिक्षेसाठी काय म्हणून फिरवता? भिक्षाच मागायची, तर दुनिया काही ओस पडली नाही. त्यात तुमच्या हस्तिदंती मध्यस्थीची मला गरजच काय? जा. मला नको तुमची मदत."
संतापाने मी तडक निघालो आणि दुपारच्या दोनच्या पडावाने पनवेलला आलो. ती आणे प्रवासखर्च आणि सकाळी उतरल्यावर दोन पैशाचा चहापाव खाल्ला होता. शिलकी श्रीबाकी अर्धा आणा राखून रात्री घरी आल्यावर अन्नाला मिळालो. काही वर्षांनी या पाजी शिक्षणोतेजक संस्थेचा छापील अहवाल पाहिला. त्यात माझ्या नि भावाच्या नावावर दहाबारा रुपये मदतीचा उल्लेख आढळला.
पांडोवा वैद्य धावणीला घावला
या सुमारास पनवेलला प्लेगोबांचा फेरा आला होता. आम्ही गावाबाहेर खजिन्याजवळ झोपडीत रहात होतो. दहा रुपये मिळवायचे कसे? काही उद्योग करावा तर गाव सारा उतून गेलेला एक मात्र सोय काढली शोधून आमच्या झोपडी-कॉलनीतच तार पोष्ट आणलेले होते. तेथे देशपांडे नावाचे पोष्टमास्तर होते. त्यांना आमच्याच झोपडीत रहाण्याची आणि पंक्तीला जेवण्याची आम्ही सोय केली होती. याबद्दल आम्ही दिडकीही घेणार नाही, अशी अट होती. उपकाराची प्रत्युपकार म्हणून पोष्टाजवळ बसून लोकांची पत्रे, मनिआरडरी वगैरे लिहिण्याचे काम करण्याची देशपांडे मास्तरांनी मला शिफारस केली. मी ती तात्काळ पत्करली. रोजी रुपया दीड रुपया कमाई होत असे. पण ती तर दहाबारा लहानथोर माणसांच्या कुटुंबाच्या निर्वाहासाठी खर्ची पडायची. केवळ उदरनिर्वाहाचीच सोय पहात मी बसलो, तर ऊरफोड करून अभ्यास केला, त्याची वाट काय?
पोष्टातले काम चालूच होते, या प्रसंगाला कोण उपयोगी पडेल? त्याचा मनोमन शोध घेत बसलो. पनवेलला पांडोबा वैद्य नावाचे माझे स्नेही होते. पूर्वायुष्यात ते शाहुनगरवासी नाटक मंडळीत किरकोळ कामे करीत असत. सध्या ते शिंपीकाम करीत होते. माणूस अतिशय जिव्हाळयाचा. पण यावेळी तोही प्लेगमुळे धंदा बंद करून, पनवेल उलवा मार्गावरील एका खेड्यात बिऱ्हाडाला गेला होता. गेलो एका संध्याकाळी जाता तीन आणि येता तीन मैलांची पायपिटी करीत पांडोबाकडे. तेथे पहातो तो त्याच्याबरोबर रहायला एक मित्र शेजारीच प्लेगने पछाडलेला. "हे पहा, केशव, आपण काय वाटेल ते करू नि रकम जमा करू. तू मॅट्रिक होऊन वकील झालंच पाहिजे. सध्या माझा धंदा तर बंदच आहे. पण लोकांकडे उधराणी बरीच आहे. आपण दोघे जाऊ काही उधराणी होते का पहायला ती होईल तितकी मी तुला देईन. असे पांडोबाने मला आश्वासन दिले.
दुसऱ्या दिवसापासून मी त्या खेडयात जायचे, मी आणि पांडोबाने गावात पायी येऊन उधरणीवाले कुठेकुठे छावणीला गेले आहेत, त्याचा शोध घ्यायचा आणि तडक त्या ठिकाणी प्रयाण करायचे. कोणी तीन मैलांवर तर कोणी सहा मैलांवर. चहापाणी, अन्न कशाचीही दिक्कत न बाळगता आम्ही दोघे उधराणीसाठी सारखे वणवण फिरत होतो. पांडोबा अत्यंत मितभाषी आणि स्वभावाने नम्र. पंधरा रुपये देणेकऱ्यांनी हातात दोन रुपये टिकवावे, तेवढेच घेऊन आम्ही दुसऱ्या ठिकाणी पायपिटी करीत जावे. असा क्रम आठवडाभर चालला होता. ही माझी धडपड देशपांडे पोष्टमास्तर पहात होते. अखेर दहा रुपये जमले आणि तारेने मनिऑर्डर करण्याचा अखेरचा दिवस उगवला. कितीही वेळ लागला तरी तुझी मनिआरडर तारेने, अगदी पोष्ट बंद झाले तरी पाठवीन असे देशपांड्यांनी वचन दिले. पण आणखी दीड रुपया पाहिजे होता. याशिवाय अर्जण्ट तार होणार कशी? पनवेलच्या तारेची बॅटरी ठाणे तारखात्याच्या स्वाधीन. संध्याकाळ सहा वाजता बॅटरी बंद व्हायची. देशपांड्यांनी ठाण्याला तसे न करण्याबद्दल कडकडकट सूचना दिलेली होती.
दीड रुपयासाठी चरित्रात क्रांती
त्या दिवशी एकट्या पांडोबाने अन्नपाण्याची पर्वा न करता, उधराणीसाठी मनस्वी तंगडझाड केली. पण आम्हाला दीड रुपया काही मिळाला नाही आणि त्या अविस्मरणीय दिवसाचा सूर्य अस्तास गेला ठराविक महत्त्वाकांक्षेचा चकणाचूर झाला. "अरे, या वर्षी नाही, तर पुढल्या वर्षी आपण धीर कशाला सोडायचा. पांडोबा माझ्या पाठीवरून हात फिरवीत म्हणाला."
हयातीत मी हजारो रुपये कमावले नि गमावले. पण तो दीड रुपया माझ्या आठवणीत कॅन्सरसारखा वरचेवर सलत असतो.
त्या सर्व प्रकरणाची आठवण झाली की त्या पांडोवा वैद्याच्या स्नेहाळ सहाय्याबद्दल आजही माझ्या डोळ्यांतून कृतज्ञतेची आसवे घळघळ ओघळतात. कोठे तो साध्यासुध्या राहणीतला शिंपीकामावर पोट भरणारा पांडोबा आणि कोठे ते चांद्रसेनीय कायस्थ माध्यमिक शिक्षणोत्तेजक फत्तरी काळजाचे कारभारी नि पुढारी, स्वतः कारकुंडे तर कारकुंडे, पण दिमाख कडककॉलर रावबहाद्दुरकीचा!
जातीय संस्थांचा विखारी अनुभव
माटुंग्याच्या जातीय संस्थेने पेरलेला निराशेचा विखार मला आणि माझ्या कुटुंबियांना अखंड भोवलेला आहे. जातीय शिक्षणोत्तेजक संस्थांचे आणि ठाकरे घराण्याचे ग्रह एकमेकांचे असे हाडवैरी का व्हावे, याचा मला अजूनही शोध लागलेला नाही. अगदी अलिकडचे उदाहरण घ्या ना. माझा पुतण्या चि. मधुकर यशवंत ठाकरे याला आर्किटेक्चर इंजिनियरिंगचे उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनला जायचे होते. उच्च शिक्षणासाठी मदत करणारी एक चांद्रसेनीय कायस्थ प्रभु संस्था आहे. तिच्याकडे अर्ज करावा काय, असे मधूने मला विचारले, तेव्हा मी आपला अनुभव त्याला सांगितला. तथापि यत्न करायला काही हरकत नाही. एवढ्या सूचनेवरून त्याने अर्ज दिला. त्याची आर्ट स्कुलातील शेवटची परीक्षा उत्तम मार्क मिळवून झालेली होती.
पण अखेर काय? व्हायचे तेच झाले. जातीय संस्थेची त्याला ऐन वेळी मदत मिळाली असती, तर सीकेपीच्या कडककॉलर इभ्रतीची परंपरा नरकात जाती आणि माझ्या कुटुंबियांना निष्कारण जातीय सहाय्याचा कलंक लागला असता ना? अखेर बंधू यशवंतरावानेच साळयाची गाय नि माळ्याचे वासरू उलाढाल करून मधूला विलायत रवाना केले. तेथे त्याची ए. आर. बी. ओ. ची परीक्षा उच्च श्रेणीत पार पडली. एका नामांकित इंजिनियरांच्या कंपनीत लंडनलाच त्याला नोकरी मिळाली. सात आठ वर्षे लंडनला वास्तव्य करून, सुएज कालव्याची भानगड झाली, त्यावेळी केप ऑफ गुडहोपच्या मार्गाने तो मातापिता आणि कुटुंबियांना भेटण्यासाठी परत आला. आज तो सिडकोमध्ये नामांकित आर्किटेक्ट इंजिनियर म्हणून काम पहात असतो.
पुन्हा मुंबईला प्रस्थान ठेवले
आमच्या परीक्षेचा तसा निकाल लागल्यावर, कुटुंब पोषणासाठी काहीतरी धडपड करणे आवश्यक होते. नोकरी मिळाली नाही, तरी माझ्यापाशी हुन्नरबाजी होती आणि पनवेलसारख्या चिमुकल्या खेडेगाववजा ठिकाणी तिचा फारसा विकास होणे शक्यच नव्हते. सबब आम्हा दोघा बंधूंनी मुंबईच्या विशाल क्षेत्रात पुन्हा प्रयाण केले. झावबावाडीत एका नव्या चाळीत (कृष्णाबाई बिल्डींग) खोली भाडयाने घेतली. रघुनाथराव खोपकर नावाचे एक दोस्त ट्राम कंपनीत ट्राफीक इन्स्पेक्टर होते, ते भागीदार मिळाले. ते विवाहित होते तरी मुंबईला सडेसोट बजरंग म्हणून रहात असत. असले बजरंग एखादी स्वतंत्र खोली घेऊन रहात असलेले आढळले का इतर तसलेच हॅविंग गिव्हन-टू-अण्डरस्टॅंण्डवाले बजरंग ओळखपाळखीने तेथे घुसायचे.
थोड्याच दिवसांत आमची ती खोली म्हणजे नरपागा बनली. किर्लोस्करादी नामांकित नाटक कंपनीचे प्रयोग पहाण्यासाठी पनवेल, पेण, उरणादी ठिकाणाहून येणारे काही ओळखीचे शौकीन दर शनिवारी सायंकाळी हमखास आमच्या ब्रह्मचारी गुहेचा शोध घेत घेत ठेपी यायचे. रात्री नाटक पाहिले का सकाळी थोडीशी इतर खरेदी आणि विशेषत. भुलेश्वरचे लाल दखनी जोडे खरेदी झाल्यावर, जुनी फाटकी पायतणे जोडे आमच्या आश्रमात ठेवून नव्या पादत्रणांच्या चटकफटक् दिमाखाने रविवारी आमचा हस्तिदंती निरोप घेऊन परतायचे. आमची खोली म्हणजे त्यांना फाटक्या तुटक्या पादत्राणांचा अजायबखाना वाटायची की काय, कोण जाणे. आमच्या खोलीची कीर्ती लवकर आणि बरीच दूरवर फैलावल्याची चिन्हे आम्हाला दिसू लागली.
दर पंधरवडयाला कोणीना कोणी खेडुती चेहऱ्यामोहऱ्याचा तरुण ट्रक वळकटी घेऊन भल्या पहाटेला दारावर टिचक्या मारताना आढळायचा. दार उघडताच "केशवराव ठाकरे इथंच राहतात ना? हा सवाल होय उत्तर मिळताच हातात चिठ्ठी पडायची. राजश्रीया विराजीत थाटाचा लांबलचक मायना झाल्यावर, चिरंजीव रघुवीर ऊर्फ बज्या याला तेथे धाडले आहे. आपण मुंबईचे माहीतगार सबब पूर्व ऋणानुबंध (कसला? त्याचा पत्ता मला तरी लागायचा नाही.) जाणून, त्याला कुठेतरी चिकटवून द्यावे. फार उपकार होतील!" आता काय करणार या कर्माला! हा बज्या काय नाटकाचे पोस्टर आहे, तर त्याला खळ माखून एखाद्या भिंतीवर चिकटवायचा? सारांश, आस्ते आस्ते आमची खोली म्हणजे बेकार बिनहुन्नरी तरुणांचा पांजरपोळ झाला म्हणाना.
यशवंतला अचानक नोकरी मिळाली.
माझी अनेक कर्तबगार आणि वजनदार गृहस्थांशी त्यावेळी चांगली ओळख होत गेली आणि फोटो- एन्लार्जमेंटच्या व्यवसायामुळे ते वर्तुळ छान वाढत होते. कोणाजवळ काही शब्द टाकला तर तो नकार देत नसे. एक पथ्य मात्र मी कटाक्षाने पाळीत असे. कसलीही अडचण असली तरी पैश्याची उसनवारी चुकूनही कधी करायची नाही. धंदेवाले चित्रकार १२ / १५"च्या एन्लार्जमेंटला पन्नास ते साठ रुपये घेत असले, तर मला पंधरा द्या. काम चोख घ्या, पण काम द्या, हे माझे धोरण असे. चढाओढ लागली तर पाच रुपयांतही काम पत्करीत असे. यामुळे अनेक मोठमोठ्या अनेक जातीय नामांकित गृहस्थांशी माझी घसट होत गेली. पैकी अॅडव्होकेट ऑफ इंडिया दैनिकाचे आणि छापखान्याचे मॅनेजर नानासाहेब चित्रे यांनी माझ्या हरएक उलाढालीत सर्वतोपरी आपुलकीने सहाय्य नि सहकार दिला. यशवंत त्यावेळी अवघा सोळा वर्षांचा होता. मॅट्रिकला बसण्याची तयारी करीत होता. पण नानासाहेब चित्र्यांनी अचानक एक दिवस "केशवराव, यशवंतची जळगावला पी डब्ल्यु-डी खात्यात नोकरीची सोय मी केली आहे, त्याला तिकडे जाऊ द्या." असे मला बोलावून सांगितले. आणि प्रवासखर्च स्वतः देऊन अवघ्या दोनच दिवसांत त्याची तिकडे रवानगीही केली. घरच्या मंडळीनाही भेटायला त्याला उजगर मिळाला नाही. आता मी आणि माझी हुन्नरबाजी.
नरपागेत अर्जखरड्यांचा धौशा
खोपकर पगारवाले. मी नाहीनाही तरी पाट्या रंगविणे. फोटो एनलार्जमेंट्स इत्यादी कामे मिळवून दरमहा वीस ते पंचवीस रुपये पाडीत असे. खोलीत घुसलेल्या इतरांनी येताना आणलेली तुटपुंज्या दमड्यांची पुंजी किती दिवस टिकणार? आई-बापांनी बरोबर दिलेल्या तहानलाडू भूकलाडूंचा डबा तर आम्ही नजरेला पडताच खलास करायचे. काही दिवस खानावळीचा दिमाख असायचा. नोकरीशिवाय तो पुढे रेटणार कसा? उजाडले रे उजाडले का सारे बेकार अर्ज खरडणीचा उद्योगकरायचे. एखाद्याला कॉल यायचा कधी एकदम दोघातिघांना यायचा. सगळ्या पेहराव तालुका फॅशनचे गावंढळ साहेबापुढे जायचे तर निदान एखादा लाँगकोट तरी हवा ना? तसा एकच कोट एका मेंबराजवळ होता. बहुतेक तो त्याच्या मुंजीतला असावा. त्या कोटसाठी आप्पा कुळकर्ण्याकडे कॉलवाल्याचा वशिला चालू व्हायचा. एकच कोट दोनतीन उमेदवारांना आणि तोही टेन-थर्टीच्या कॉलसाठी द्यायचा कसा? मग गिरणबाबू आप्पासाहेब कुलकर्णी श्रीकृष्ण भगवंताचा आव आणून, प्रथम शब्द टाकला असेल त्याला तो द्यायचे.
सकाळच्या चहासाठी जो तो बाहेर हाटेलात जायचा पण जेव्हा सगळ्यांचा खिसा रिकामा राहू लागला. तेव्हा प्रातर्चहाच्या पुरवणीचा डोळा माझ्या नि खोपकराच्या खिशाकडे पळू लागला. मम्मंची सोय? तीसुद्धा एक भानगडच होऊन बसली. त्याकाळी खानावळीत जेवणारांना दर महिन्याला चार पाहुणे माफ असत. मग आम्ही दोघे, आमच्या पोटाचा व्यवहार सांभाळून भेटेल त्या ओळखीच्या खानावळ्या मित्राला "कायरे या महिन्याचे पाहुणे शिल्लक आहेत का? विचारायचे त्याने आहेत बुवा फक्त दोनच किंवा एकच" असे उत्तर दिले तर लगेच तितक्या बेकार नरपुंगवांना त्याच्या बरोबर पुण्याला पाठवायचे दोन खोली ब्लॉकचे भाडे आठ रुपये होते. खोलीत बजरंग जमले होते बारा. पण भावासाठी एकाकडूनही दमडी सुटेना सुटणार कशी? चहाला महाग, ते भाडे काय देणार नि आम्ही काय मागणार? अखेर चार महिन्यांचे भाडे तुंबले. चाळीचा भैय्या रोज सौम्य भाषेत का होईना मला तगादे करू लागला.
एकदोन वेळा मी आणि खोपकरांनी तसली मोकांड भागविली. पण पुढे पुढे चिकटून घेण्यासाठी आलेल्या आणि नित्य सहवासामुळे दोस्त बनलेल्या चिकट्याचा चिकटा सोडवावा कसा. हा आमच्यापुढे चिनी युद्धबंदीइतकाच त्रांगड्याचा प्रश्न पडला. आम्ही आमचा मुंबईचा आणि घरच्या कुटुंबाचा खर्च चालवावा, का बेकार नरपागेच्या पोषणाची गणिते सोडवावी? आसऱ्याचा धर्म करता पोषणाचे कर्म पाठीशी लागले. आमच्या खिशात किंचित पैसे खुळखुळले का लेकाचे लाज शरम सोडून, "अहो ठाकरे, जेवण नसले तरी चालेल पण चहाची तरी सोय करा हो. सकाळपासून पाण्यावर आहोत" असा पिच्छाही पुरवायचे. दिडकीला फुल कप असला तरी दहा बुभुक्षितांचे घसे गरम करायला चटकन अडीच आणे उडायचे. त्यावेळी दिडकीला किंमत होती ना! आज रुपयाचे शंभर पैसे असले तरी त्याकाळच्या रुपयाच्या चौसष्ठ दिडक्या दहा माणसांच्या कुटुंबाला दोन दिवस तरी सुखाचा घास चारीत असत.
भास्कर रणदिवे एक मगजबाज वल्ली
सर महादेव भास्कर चौबळांकडे तो हायकोर्टात कॉपीरायटरचे काम करीत असे. त्याकाळी टाइपरायटर आले नव्हते. एकटाकी उत्तम इंग्रेजी हस्ताक्षर लिहिणाऱ्या कॉपीरायटरांना मनस्वी मागणी असे सगळ्या कोर्टातली सरकारी अर्ज अपिले लिहिण्याचे कामे कॉपीरायटरच करायचे. स्वतंत्र कमाई चांगली. भास्कर रणदिवे महा मगजबाज बेरकी वल्ली तो विवाहित होता आणि आमच्या खोलीच्या शेजारी पत्नीसह रहायचा. आमच्याशी तो फार मनमोकळा वागायचा तुमच्यापैकी चांगल्या हस्ताक्षराचे कोणी असतील, तर आत्ता लावतो कामाला, असे तो वरचेवर बेकार नरांना हटकून सांगायचा. पण एकेकाचे हस्ताक्षर म्हणजे दिव्या शिवाय इंग्रेजी भाषेची व्याकरणशुद्धी तर त्यांच्या गावीही नसायची. नगरपागेची तारांबळ तो रोज पहात असे. अखेर भास्करने एक अचाट युगत, लढवून आम्हा सगळ्यांना त्या जागेतून सफाईत कसे सोडविले ते पहा.
भास्करच्या युक्तीने जागा बदलली
झावबावाडीतील जागा बदलणे भागच पडले, पण ती तुंबलेले भाडे दिल्याशिवाय बदलायची कशी? भास्करचेही भाडे तुंबलेलेच होते. त्या डोकेबाजाने नाना फडणिशी डोके चालवले आधी त्याने मांगलवाडीत दोन जागा ठरविल्या. एक आमच्या नरपागेसाठी आणि दुसरी स्वतःसाठी, आम्ही एकेकाला ती नेऊन दाखविली. मग एका सकाळी त्याची युगत अंमलात आणली. बेकार स्नेह्यांजवळ मी भाडे देण्याचा हट्ट धरला. सगळ्यांशी कडाक्याचे भांडण जुंपले. प्रकरण हातघाईवर आले. "भाडे द्यायचे नसेल तर आत्ताच्या आता जागा सोडून चालते व्हा", असा मी दम भरला. "हो हो, जातो जातो. एवढी जागेची मिजास कशाला?" वगैरे बडबडत प्रत्येकाने हमाल बोलावले आणि बिछान्याच्या वळकट्या ट्रंका डोक्यावर देऊन तणतणत चाळ सोडली.
चाळीचा भैय्या हे सारे पहात होता. मात्र सामान नेत असताना, प्रत्येकाने आपल्या ट्रंक- वळकटीबरोबर आमच्याही ट्रक- वळकट्या हमालांच्या डोक्यावर नेण्याची युगत केली. त्यामुळे आपोआप सगळ्यांचे सामान नव्या जागेत सुखरूप जाऊन बसले. अखेर खोलीत पाहुण्यांनी सावडलेल्या फाटक्या पायताणांची रास, बुडाला भोक असलेली बालदी आणि बाह्य कर्तव्याचे टमरेल उरले "सगळ्यांना हाकून दिले हे फार चांगले केले" असे भैय्याने मला सर्टिफिकीट दिले. थोड्या वेळाने मीही दरवाजाची नुसती कडी ओढून बाहेर पडलो आणि नव्या जागेत आलो तेथे आमच्या बेकार नगरपागेची छावणी थाटलेली होती.
जागा संशोधनात भास्कर रणदिव्याने झक्क डोके लढविले होते. मांगलवाडीच्या नाक्यावरची पाटीच किती आकर्षक होती पहा ना.
इया वारीमंदी कोलिया भारीयानी
देन्याचा असो. बहियाला ईचारावा.
पाटीवरील अक्षरे भय्यानेच आपल्या अगाध मरहाटी अक्षरांनी पाटी रंगविणाराला लिहून दिलेली असावी आमची जागा खरोखरच चहूबाजूंनी तटबंदी होती. गल्लीत चालत गेल्याबरोबर समोर अचानक बोहऱ्यांची मशीद आडवी थाटलेली. म्हणजे रस्ता बंद पाहून परतण्याचा प्रसंग. पण तेथेच उजव्या बाजूला सहसा न दिसणारा चारफुटी बोळ, तेथूनही कोणी पुढे सरकलाच तर समोर दोहऱ्यांच्या कबरस्थानाची थडगी त्याला धमकवायला उभी. चटकन डाव्या बाजूला वळल्यावर मात्र आतील वाडीचा देखावा नजरेला पडायचा. सुप्रसिद्ध शिल्पकार म्हात्रे यांचे घर तेथेच त्यासमोरच आमची दोन मजली चाळ. पहिल्या मजल्यावर कोपऱ्यावरची, लहानसान नव्हे चांगली शंभर औरसचौरस फुटांची शिंगल खोली. त्यात एकूण अकरा-बारा नरपुंगवांचा बेकार संसार थाटलेला. अशा ठिकाणी आमचा पत्ता नेहमीच्या सरावाशिवाय इतरेजनांना लागणे कठीणच. भास्कर रणदिव्याचेही काही सामान आमच्या भांडकुदळ कंपूने तणतणत जाताना वरच्या मजल्यावरील त्याच्या खोलीत आणून टाकलेले होते आणि दुसऱ्या दिवशी तोही गावी पेणला आठवडाभर जातो म्हणून बाकीचे सामान घेऊन तेथे येऊन प्रस्थापित झाला. आमची चाळ जुनाट होती.
त्यावेळी मुंबईत नवनव्या चाळी ठिकठिकाणी बांधल्या जात होत्या, पण भाडेकऱ्यांचीच काय ती टंचाई असे. जागोजाग टु बी लेट च्या पाट्या टांगलेल्या. केवळ याच लहानमोठ्या पाट्या रंगविणाऱ्या पेण्टरांची खास दुकानेच होती. आले भाडेकरू तर आले. गेले तर गेले, घरवाले त्याची फारशी दिक्कत बाळगीत नसत. इतकेच काय, पण अडीअडचणीने जागा सोडून जाऊ पहाणाऱ्यांना, ते स्पष्ट सांगत, "अहो, नसेल भाडे देणे परवडत, तर दुसरीकडे जा. उगाच येथले भाडे तुंबवीत कशाला बसता?"
नरपागा थाटली पण
जागा बदलली म्हणून बेकारांची परिस्थिती थोडीच सुधारली म्हणता? येथे तर अशी अवस्था झाली की प्रत्येकाच्या चहा-पोट पाण्याला जणू मीच जबाबदार अशा भूमिकेत त्यांनी मला आणून सोडले. आंघोळीची एक बालदी आणि परसाकडचे टमरेल एवढी इस्टेट मी नवीन आणली होती. सकाळी तोंड धुणे वगैरे आटोपल्यावर चहाचा सवाल. मी एक स्टोव्ह आणला होता माझ्यापुरत्या चहासाठी. पण इतरांना वगळून चहा घेताना तो घशाखाली उतरणार कसा? पनवेलच्या घरच्या माणसांचे पाहू का या नरपागेच्या चहा-मम्मंकडे पाहू. असा पेच पडला, हो, माझी कमाई ती किती? जेमतेम चारपाच तारखेपर्यंत घरी दहाबारा रुपये जातात कसे नि माझे येथले भागते कसे, याची रोज विवंचना ओळखीचा जो जो म्हणून खानावळ्या स्नेही भेटे, त्याला "आहेत कारे तुझे पाहुणे शिल्लक?" असे रोज विचारायचा. जो कोणी १, २, ३, ४, आकडा सांगायचा, त्याच्याबरोबर नरपागेतले तितके महाशय जेवायला पाठवायचे, पण हे तरी किती दिवस चालणार? चुकून कोणाला घरून मनिआरडर आली रे आली का त्यावर सगळ्यांची धाड पडायची. मग काय? दोनचार दिवस सारे रावबहादुरांचे चिरंजीव. एक मात्र निश्चित. प्रत्येकाची अर्जखरडणी नियमित चालू असे.
जेवण नसले तरी चालेल, पण
दोन वेळा चहा तर खरा. हो खराच! पण त्यालाही चहा, साखर, दूध लागते ना? ते कुठून आणायचे? मी एक पौंड चहा नि कण्डेंस्ड मिल्क चा डबा आणून ठेवीत असे. बाहेर गेलो का मागे त्याचाही फन्ना उडायचा. भास्कर रणदिव्याने युगत सुचविली आणि चारपाच वीर त्या कामाला निघाले प्रत्येकाने कोटाच्या आतल्या बाजूला मोठमोठे दोन खिसे घेतले आणि पडले बाहेर. चहावाल्यांच्या दुकानी आणि वाण्यांच्या दुकानी जायचे. मुंबईतील कोणातरी थोरामोठ्याचे नाव सांगून, त्यांच्या घरी मुंज आहे. लग्न आहे. चहाचे नमुने साखरेचे नमुने दाखवा, भाव सांग, असा बहाणा करून, नमुन्याच्या पुड्या मिळवायच्या, कागदावर भावांचे आकडे टिपून घ्यायचे, आणि पुढच्या दुकानात जायचे, असा क्रम चालू झाला. खानावळीतून जेवून मी खोलीत आलो तो काय?
महासाखरेची कामधेनू समोर दहापंधरा पौंड निरनिराळ्या चहा मिक्श्चरांचा ढीग आणि दुसरा मोरस पिठी गुळी यच्च्यावत साखरांच्या मिसळीचा ढीग. दोनतीन महिने तरी आता सकाळदुपाराच्या चहाची चिंता करा ला नको. अशा मर्दानी मोहऱ्याने सारे कलेक्टर `बाजूला बसलेले. "हे पहा दादा, आम्ही इतके केले, आता कंडेंस्ट मिल्क आणि स्टोव्हची सोय तुम्ही लावली पाहिजे." हुकूमच लेकाच्यांचा तो! जणू काय, त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी माझ्याच माथ्यावर थापलेली. रोज बाटलीभर राकेल लागणार, ते तरी मी कुठून पुरवायचे? शेजारीच उभा असलेला भास्कर म्हणाला "त्यात कसली अडचण? राकेलला काय दिडक्या दमड्या मोजाव्या लागतात?" अडमुठ्यासारखा मी त्याच्या तोंडाकडे पहातच राह्यलो भास्कर "मी कुठं कधी विकत आणतो? पण असतो का माझ्या खोलीत काळोख? याला डोकं लागतं महाराज्या." डोक्याचे ते भास्करी इंगित कोणतं? रोज संध्याकाळी एक राकेलवाला चाळीत यायचा. आला का तेलाचा उघडा डबा, त्यावर ती नरसाळी नि लांब दांडयाची मापणी अडकवलेली.
दुसऱ्या मजल्याचा, म्हणजे भास्कर रहात असे त्याचा जिना अरुंद नि सरळसोट होता. राकेलवाला डबा आमच्या कोपऱ्यावरच्या खोलीच्या दरवाज्याशी ठेवून बाटल्या आणायला वर जायचा. राकेलवाल्याची आरोळी ऐकली का भारकर बाटसी घेऊन आमच्या खोलीजवळच्या गॅलरीत येऊन आडोशाला उभा रहायचा. राकेलवाला वर गेला का बाटली डब्यात बुचकळून भरून घ्यायचा आणि वर जाऊ लागायचा. राकेलवाल्याची नि त्याची भेट जिन्यातच झाली तर अरे भय्या वर भय्याजी आप आये? हम समजे के आप आनेवाला नही. सबब ये देखो बाजारसे लायी बाटली असे म्हणून सटकायचा. "यू आर ऑल फूल्स", भास्कर म्हणाला, गेला का आपली बाटली भरून घ्यायची बाटली नसली तर तपेली. पण हे नाही ते नाही. ही कसली रडगाणी गात बसता? या मुंबईत जगायचं आहे ना तुम्हाला? मग अशाच लटपटी केल्याशिवाय सुटका नाही. एरवी कोण शहाणा येणार तुमची कीव नि मदत करायला?
धनार्थी याने एकवीस दिवस ग्रंथ आदरे वाचाया
या व्यंकटेश स्तोत्रातील आदेशाने आमच्या नरपागेत एक विलक्षण घडामोड घडविली. ट्राम-इन्स्पेक्टर रघुनाथराव खोपकर दररोज भल्या पहाटे उठून बाहेर जाऊ लागले. सातच्या सुमाराला यायचे ते फक्त नेसूच्या ओल्या धोतरात उघडेबंब. जणू काय नुकतेच हिमालयातून तपश्चर्या पुरी करून आल्यासारखा गंभीर चिंतनमग्न चेहरा तोंडाने काही पुटपुट चाललेली. बरेच दिवस जिज्ञासा दाबल्यानंतर एक दिवस मी विचारले, तेव्हा ते म्हणाले, "लवकरच नोकरीचा राजीनामा देणार आहे मी." ही काय भानगड बुवा? बेकार पलटणीत ही नसती जादा अडगळ कां? खुलासा विचारता, खोपकर गंभीरपणे उद्गरले "आहे काय या पंचवीस रुपयांच्या नोकरीत? ग्वालेर सरकारच्या पुण्यानजीकच्या जहागिरीच्या एका गावचा मी कमावीसदार होणार आहे."
मी: ठीक आहे, पण त्यासाठी रोज पहाटे हे काय चालवले आहे?
खोपकर: व्यंकटेश स्तोत्राचे समुद्रकाठी जाऊन एकवीस दिवस पारायण करायचे आहे. : धनार्थी याने एकवीस दिवस स्तोत्र पठण करावे, असे देवीदास विनदी श्रोतिया, ग्वालेर दरबारला अर्ज धाडलाच आहे. त्या जहागिरीचा कमावीसदार म्हातारा झाल्यामुळे त्याला ते काढणार आहेत. त्या कामाला जोर लागावा म्हणून स्तोत्रपठण करीत असतो.
या माणसाच्या डोक्यात कसली खीळ ठोकली गेली, याचा मी बिनचूक कयास केला. गुरुचरित्रासारख्या ज्या काही पोथ्या आहेत. त्यांच्या वाचनपठणाच्या आहारी जो गेला, तो हयातीतून उखडलाच पाहिजे. व्यंकटेशस्तोत्र हे त्यांपैकीच एक. पुढे पुढे पहाटे चारला चौपाटीवर जाऊन ही स्वारी अकराबाराला परतू लागली. असल्या पिसाटामागे लागलेल्या लोकांना सावधानतेचा इशारा देणेही धोक्याचे असते मी एकदा दोनदा दिलासुद्धा. "आज हसत आहात केशवराव, पण पहाल चमत्कार या पठणाचा, देवीदास विनवी श्रोतिया चतुरा, प्रार्थना शतक पठण करा, जावया मोक्षाचिया मंदिरा काही न लागती सायास. समजलात?" खोपकर ठणकावून सांगायचे.
मी : अहो, तुम्हाला कमावीसदारकी पटकवायची आहे. का मोक्षाचे मंदिर गाठायचे आहे? कमावीसदारीसाठी जे व्यावहारिक यत्न करायचे, ते सोडून या स्तोत्रपठणाच्या काय नादी लागलात?
खोपकर : हां तेच तेच. अध्यात्माचे गूढ तुमच्यासारख्या प्राकृताला काय कळणार महाराजा!
मी : धनार्थी याने एकवीस दिवस पठण करताच काय लक्ष्मी येऊन पायाशी लोळणार? पटत नाहीया हे आपल्याला. देवीदास असेही म्हणतो की "पुत्रार्थी याने तीन मास आणि कन्यार्थी याने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा" तीन महिने पठण करून जर पुत्रप्राप्ती होत असेल, तर आणखी तीन महिने जादा चर्पटपंजरी करून षण्मासीचा कन्याप्राप्तीच्या वायद्याचा फायदा कोण पदरात पाडून घेईल? हा कदाचित देवीदासाच्या काळात मुलींना कचकचित हुडे मिळत असावेत, म्हणून त्या काळचे लोक पुत्रलाभासाठी तीन महिन्याची कवाईत करण्याऐवजी सहा महिन्यांची कसरत करीत असावे.
खोपकर : आज थट्टा करा, पण पहाल लवकरच सारा चमत्कार.
आणि जेहते काय सांगावे? खरोखरच खोपराचे एकवीस दिवसांचे चौपाटीचे पुरम्वरण संपताच धक्क बाविसावे दिवशी पोष्टमनने त्यांच्या हातांत भलामोठा लखोटा आणून दिला आणि रघुनाथरावांचा चेहरा गुलमोहरी फुलून ते आनंदाने नाचू लागले.
"जहागिरीची व्यवस्था लावण्यासाठी अमुकतमूक राजेश्री मुंबईला येत आहेत. आपण त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी जावे. त्यांना तिकडील प्रदेशाची काही माहिती नाही." असा दरबारचा हुकूम खोपकर त्या दरबारी हापसरच्या स्वागताच्या तयारीला लागले. एकाचा परीटघडीचा इस्तरीचा शर्ट आप्पा कुळकर्ण्यांचा तो लॉगकोट चांगली इस्तरी करून आणला, कोठून तरी रेशीमकाठी उपरणे पैदा केले, भास्कर रणदिव्याने लग्नातला जरीचा रुमाल (फेटा) दिला. हे सारे जमले. पण येणाऱ्या ग्वालेरी महाशयांना भोजन वास्तव्यासाठी, एक दिवस का होईना, पण सांवडायचे कुठे? त्यावेळी बोर्डिंगचे आश्रम मुंबईत जन्माला आले नव्हते. शोधाशोध नि विचारपूस करता, सुप्रसिद्ध बटाटा-भज्याचे उत्पादक दादा शेवडे हॉटेलवाले (मामा काणे येथेच ती कला शिकले) यांनी रोजी वास्तव्याचे तीन रुपये आणि भोजन खर्च (साधा बेत) रु. दीड, आणि पक्वान्न असल्यास रु. अडीच भावाने हॉटेलवरच्या स्वतःच्या भाडयाच्या रहात्या जागेतील एक खोली देण्याचे कबूल केले. एवढा मोठ्ठा पाहुणा यायचा तर त्याला वरण-भात-भाजी-आमटीचा बेत कसा चालणार? किमान श्रीखंडपुरी हवीच. शिवाय, त्याच्या पंगतीला चारपाच महाशय तरी हवेतच ना? तसल्या महाशयांना आमच्या नरपागेत तुटवडा नव्हताच.
खोपकरांनी ताडकन खिशातून दहा रुपये काढून दादा शेवड्यांच्या हातात टिकवले आणि सरबराईच्या व्यवस्थेचा तपशील सांगितला. ठरल्या वेळी खोपकर रावबहादुरकीचा जामानिमा करून पाहुण्यांना वेलकम करायला व्हिक्टोरियात बसून बोरीबंदरावर गेले. काही वेळाने नरपागेत येऊन पाहुणे आल्याची त्यांनी आम्हाला वर्दी दिली. प्रथम आम्ही सारे त्यांना जाऊन भेटलो. बरोबर एक हुजऱ्या होता. त्याने शिलगावलेला लांबलचक नळीचा हुक्का पीतपीत स्वारी लघु लोडाला टेकून बसली होती. इकडची तिकडची निष्कारण हस्तिदंती झाल्यावर आम्ही स्वस्थानी आलो. खोपकर त्यांच्याच दिमतीला चिकटले. रात्री मेजवानीचा बेत आणि दुसरे दिवशी प्रयाण, मेजवानीच्या पुख्ख्याला आम्ही सारे हजर होतोच. पण श्रीखंड चापतानाच दरबारी महाजन उद्गारले "हे पहा खोपकर, आल्यासरशी एकदा सारी मुंबई पाहून घ्यावी म्हणतो."
खोपकर : आपला मनोदय वाजवी आहे. तब्बल तीन दिवस व्हिक्टोरिया आणि यजमान पाहुणे यांनी पन्नासावर रुपयांची चटणी केली. चटणी खोपकराच्या खिशाची. त्या लेकाने एकदाही गजव्याला हात घातला नाही. हवा तो खर्थ खोपकर फटाफट नोटा बाहेर काढून करीत आहे, तर खरोखर एकवीस दिवसांच्या पारायणाने याला लक्ष्मी प्रसन्न झाली की काय? आम्हाला आश्चर्यच वाटू लागले. मग खोचून चौकशी करता, त्यानेच उघड केले की तीन महिन्यांपूर्वीच त्याने नोकरीचा राजीनामा दिला होता आणि सव्वाशे का दीडशे रुपये ग्राच्युटी घेतली होती, त्यातले हे रुपये.
अन्नासाठी दाही दिशा ।
तीन दिवस जिवाची मुंबई केल्यावर ते बुढ्ढे दरवारी पाहुणे खोपकरांना बरोबर घेऊन पुण्याला गेले. आता काय? जहागिरीत पाऊल ठेवताच, जुना म्हातारा कमावीसदार बडतर्फ होऊन, त्या जागेची स्वयंवरमाला माझ्याच गळ्यात पडणार, अशा हुरूपीने खोपकर त्या पाहुण्याभोवती पिंगा घालीत होते. म्हटले कशा का उपायांनी होईना, आमच्यातला एक मानपानाच्या जागेवर जातोय, ठीक आहे.
पुण्याहून त्या ग्वालेरी जहागिरी गावाला दोघेजण गेले. कमावीसदाराने दोघांचाही सत्कार केला. तेथे आणखी एक असामी हजर होता. त्याने आपले नावगाव सांगून एक दस्त दरबारी महाशयांच्या हाती दिला. "असं असं, तुम्हीच का ते" इतके म्हणून "काय कमावीसदार, कामाची सगळी माहिती यांना दिली आहे ना तुम्ही?" होय, असे उत्तर मिळताच, स्वारी स्नानभोजनादी विधीसाठी उठली. सगळ्यांची भोजने झाली. पानविडे हुक्का झाल्यावर, तेथलीच गाडी घेऊन खास पाहुणे नि रघुनाथराव निघणार तोच रघुनाथरावाने विचारले, "आपण तर निघालात, माझी काय व्यवस्था लावली?"
दरबारी : आता चला, पुण्याला गेल्यावर सांगतो.
दोघे पुण्याला येताच, दरबारी म्हणाले, "ह बोला आता. तुमची व्यवस्था ती कसली? प्रवास खर्चाचीच ना? हे घ्या दहा रुपये."
खोपकर : मी कमावीसदारीसाठी अर्ज केला होता.
दरबारी : अहो, असे चारपाच अर्ज आले होते. पण नेमलेला कमावीसदार जुन्या कमावीसदाराचा पुतण्या. त्याला दरबार वगळणार कसा? तुमचा अर्ज मुंबईहून आला. मला इकडची काही माहिती नाही. म्हटले, तुम्हालाच बरोबर घेऊन इकडे यावे, म्हणून तसा खलिता पाठविला तुम्हाला. त्यात तुमच्या नेमणुकीचा एक शब्द, तरी आहे का? बाकी तुम्ही आमची बडदास्त छान ठेवलीत हो, खोपकर साहेब.
इतके बोलून स्वारी गाडीत चढली नि निघून गेली.
बिचारा रघुनाथराव चक्रे भ्रमति मस्तके अवस्थेत स्टेशनवरच बसून राहिला. केले काय नि झाले काय? रात्रीच्या गाडीने निघाला नि पहाटे आला नरपागेचे दार ठोठावीत. अर्थातच "काय? झाली का नेमणूक?" असे जो तो उत्कंठेने विचारू लागला. रघुनाथरावाच्या पडक्या नि मलूल चेहऱ्यानेच सांगितले की कामाचे ओंफस झालं असावं म्हणून, चहापाणी झाल्यावर त्याने सगळी कर्मकथा कथन केली. हे पहा रघुनाथराव, मी बोललो, "व्यंकटेश स्तोत्रातले धनार्थी याने एकवीस दिवस एवढेच वाक्य तुम्ही विचारात घेऊन आचारात फळविण्याचा खटाटोप केलात. पण त्यातले खरे मर्मी सूत्र कोणते माहीत आहे?" "अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविशी जगदीशा, कृपाळुवा परमपुरुषा, करुणा कैसी तुज न ये." हे. आला ना अनुभव? तिकडे वशिल्याची प्यादी फटाफट हालत होती नि तुम्ही बसला होतात ओलेत्याने चौपाटीवर स्तोत्राचे संतर्पण करीत.
स्वदेशी चळवळीचे आंदोलन
तनमनधनाचा संपूर्ण त्याग करून, महाराष्ट्राने गाजविलेले माझ्या आठवणीतले हे पहिलेच भारतव्यापी आंदोलन, स्वदेशी आणि बहिष्कार (ब्रिटिश मालावर) या दोन शस्त्रांनी आपण ब्रिटिशांना चोहोबाजूंनी बेहद्द हैराण करून देशोधडीला पिटाळून लावू या एकाच आत्मविश्वासाने आबालवृद्ध आपादमस्तक संचरलेले होते. सकाळसंध्याकाळ मुंबई शहर व्याख्याने प्रवचनांनीच नुसते घोंगावत होते असे नव्हे, तर वाड्यावाड्यांतून स्वदेशीचे स्वयंप्रचारक प्रचारकार्याचा धुमाकूळ चालवीत होते.
स्वदेशी स्वीडिश...मोहिनी
स्वदेशीचा उन्माद सगळ्यांच्या डोळ्यांवर अपरंपार चढला होता. वाटेल त्या फेरीवाल्याने यावे आणि हवी ती वस्तू स्वदेशी म्हणून पुकारताच त्याच्या मालाची बोलबोलता विक्री व्हावी, हे अगदी ठरून गेल्यासारखे होते. पण ती वस्तू खरोखरच स्वदेशी आहे का नाही, याचा शोध घेण्याचीही शुद्ध सहसा कोणाला रहात नसे. एकदा एका शनिवारी सायंकाळी ग्रँटरोड नाक्यावर, पुलाच्या तोंडाशी, एक मुसलमान फेरीवाला, "स्वदेशी म्याच बाकस्, अढाय आना डझन" गर्जना करीत उभा होता. हा हा म्हणता स्वदेशी आगपेट्या खरेदी करणारांची त्याच्याभोवती झुंबड उडाली. मीही अर्थात त्यात होतोच. "स्वदेशी छाप देखके लेना", हेही त्याचे पालुपद चालू होते. लेबल आम्ही पाहिले. खरोखरच त्यावर `स्वदेशी` अशी इंग्रेजी अक्षरे आम्हाला स्पष्ट दिसली. मी एक डझनाची पेटी खरेदी करून दादरला आलो. भेटतील त्यांना दाखवीतच बिऱ्हाडी पोहोचलो! "वा वा, छानच निघतो हो आपला स्वदेशी माल, अगदी विलायतच्या तोडीचा" जो तो हे सर्टिफिकीट देऊ लागला.
काही दिवसांनी एक विडीबहाद्दर मला भेटायला आले. मी आगकाड्यांची पेटी घरातून मागविली. मुलीने ती आणून दिली. संभाषण चालू असतानाच, सहजगत्या पेटीच्या लेबलावर मी किंचित चिकित्सेने नजर टाकली तो काय? `स्वीडिश मॅच` ही अक्षरे! अरेच्या, हा विलायती माल कुठून आला आपल्या घरात? म्हणून घरात खडसावून विचारता, ताई तितक्याच तडफेने गरजली, "कुठून म्हणजे? त्या दिवशी आणलेल्या स्वदेशी डझनातली ही पेटी." च्याटच पडलो मी. स्वदेशी (Swadeshi) आणि स्वीडिश (Swedish) या दोन शब्दांतला भेदही न उमगण्याइतकी आम्हा सर्वांच्या डोळ्यांवर झापड पडली होती म्हणावं, का त्या फेरीवाल्याने आम्हाला मोहिनी घातली? स्वदेशीच्या धुंदीने लोक आंधळे झाले होते अगदी.
चर्नीरोडचा रायडिंग स्टोन
चर्नीरोड बागेला बाहेरच्या बाजूला घोडदौडीसाठी मुद्दाम तयार केलेल्या रायडिंग पाथजवळच एक अडीचतीन फूट उंचीचा, एक पायरीचा, चौकोनी कातलेला धोंडा असे. रायडिंग पाथ म्हणजे मुरुमी फूटपाथला लागूनच घोड्यांवरची रपेट करणारांसाठी चर्नीरोड ते थेट कुलाब्यापर्यंत समांतर एक स्वतंत्र रस्ताच असे. त्यावर मातीत मिसळलेल्या गवताचे दाट आच्छादन असे. रोज सांजसकाळी अनेक गोऱ्या बाया-बुवा त्यावर घोडदौडीची रपेट करीत असत. या धोंड्यांचा उपयोग घोड्यावर चढून बसण्यासाठी होत असल्यामुळे त्याला रायडिंग स्टोन म्हणत असत.
सायंकाळी चौपाटीवर निरनिराळ्या पंथाच्या वक्त्यांची ठिकठिकाणी व्याख्याने व्हायची. ख्रिस्ती मिशनरी, आर्य समाजी भगवे प्रचारक, इस्लामी मुल्ला यांच्या व्याख्यानांचे अंतराअंतरावर तळ पडायचे. प्रत्येकाची शर्यत रायडिंग स्टोन काबीज करण्याची. त्यावर वक्ता उभा राहिला का बागेतून येणाऱ्या मंडळींचा श्रोतृसमाज आपोआप लाभायचा. धोंड्याच्या आजूबाजूला जागाही प्रशस्त होती. सभोवार श्रोते नि मधोमध वक्तेबुवा, असा थाट जमायचा. हा धोंडा हातचा नव्हे, पायचा गेला. का इतरांनी मग चौपाटीवर कोठेही उभे रहावे नि बडबडावे विख्यात मिशनरी कर्नल विल्सन आणि श्रीविष्णुबुवा ब्रह्मचारी यांची व्याख्याने याच धोंड्यावर उभे राहून व्हायची, असे म्हणतात.
माझा जाहीर व्याख्यानांचा श्रीगणेशा
स्वदेशीच्या हंगामात दररोज सायंकाळी त्या रायडिंग स्टोनवर उभा राहून जाहीर व्याख्याने देण्याचा मी उपक्रम चालू केला. याकामी मला मोने नावाच्या एका तरुणाचा सहकार लाभला होता. (हे मोने हिंगणे बुद्रुक शाळेत मागाहून शिक्षक होते.) रोज सायंकाळी तो धोंडा काबीज करण्यासाठी आमची धडपड चाले. मी आणि मोऱ्याने स्वदेशी नि राष्ट्रभक्तीवर काही कविता तयार केल्या होत्या. मोने आधी स्वतः चौपाटीवर जाऊन धोंड्यावर उभा रहायचा आणि मोठमोठ्याने त्या कविता साभिनय गाऊ लागायचा. त्याला पर्सनॅलिटी काहीच नव्हती. चेहरा देवीच्या व्रणांनी डागाळलेला एका डोळयात फूल पडलेले. आवाज भसाडा पण लेकाचा तो गर्दी जमवायचा. मला यायला वेळ लागला आणि कविता संपल्या तर तोही व्याख्याने द्यायचा. मी आल्यावर माझी सरबत्ती चालू व्हायची. थोड्याच दिवसांत आम्ही आमच्या श्रोतृवर्गाचा एक कंपू तयार केला. अहो, त्यावेळी काय पाचपन्नास माणसे जमली का प्रचंड सभा व्हायची.
स्वदेशी वस्तू-प्रचारिणी सभा
या हंगामात आर्यन हायस्कूलचे एक शिक्षक श्री. वामनराव रामचंद्र जोशी यांनी स्वदेशी वस्तू-प्रचारिणी सभा स्थापन केली. दर रविवारी मुंबईत कोठे ना कोठे प्रशस्त जागा पाहून, स्वदेशी वस्तू-विक्यांच्या दुकानांची जत्रा आणि कोणातरी थोरामोठ्या नामांकित पुढाऱ्यांची जाहीर सभेतील भाषणे, असा कार्यक्रम असे. वामनराव जोश्यांनी माझी चौपाटीवरची पुष्कळ व्याख्याने ऐकलेली होती. एक दिवस त्यांनी मला गाठून प्रचारिणी सभेच्या जाहीर सभांतून व्याख्याने देण्यासाठी हुकमी वक्ता म्हणून सहकाराला घेतले. त्यावेळी मुंबईत झालेल्या जाहीर सभांच्या प्रत्येक कार्यक्रमात मी पट्टीचा तरुण वक्ता म्हणून नाव गाजविले.
विविध स्वदेशी मालांच्या शेदीडशे दुकानांची जत्रा गिरगाव-कोट विभागापेक्षा दादर-माटुंगा-शीव विभागात भरविणे त्याकाळी सोयीस्कर असे. सभाही अक्षरशः प्रचंड व्हायच्या. लो. टिळक, काळकर्ते अण्णासाहेब परांजपे, भालाकार भोपटकर, नाशिकचे बाबासाहेब खरे यांसारखे पुढारी सभांना अध्यक्ष लाभायचे, मग गर्दीला हो काय तोटा? तशात अनेक प्रकारचा स्वदेशी मालही जत्रेत खरेदी करायला आबालवृद्ध स्त्रीपुरुषांची झुंबड उडायची, ती वेगळीच. अशा सभांतून मलाही बोलण्याची हमखास संधी मिळत गेल्याने, या सर्व थोर पुढान्यांचा नि माझा परिचयही होत गेला. एक पाणीदार तरुण नि पट्टीचा वक्ता म्हणून सभेच्या वेळी "तो ठाकरे आलाय की नाही?" अशी ते वामनराव जोश्यांजवळ चौकशीही करायचे.
बाबासाहेबांचा बांझाय दाय निप्पोन
एक सभा शीवच्या सॅनिटेरियमच्या प्रशस्त प्रांगणात भरली होती. मुख्य वक्ते होते नाशिकचे बाबासाहेब खरे. त्या सुमाराला रशियाचा धुव्वा उडवून जपान जगद्विख्यात झाला होता. भारताच्या स्वातंत्र्याचे पांग फेडील तर एक हा जपानच, अशी सर्वत्र आशा फैलावली होती. पुढारीही त्या आशेला चिकटूनच होते. कोठेही सभा असो, त्यावेळी `वन्दे मातरम`च्या बरोबर * बांझाय दाय निप्पोन च्या गर्जना जोरदार व्हायच्या. शीवच्या सभेत खरे जपानच्या महात्म्यावर बोलत असताना इतके भावनावश झाले आणि बोला...ओरडा...कण्ठशोष करत गर्जना करा...बांझाय दाय निप्पोन असा मोठ्याने आक्रोश करु लागले.
इतक्या झपाट्याने ते जोरदार हातवारे करू लागले की चारपाच मिनिटांच्या आतच ते बेभान झाले आणि तेथेच बेशुद्ध पडले. वाहवा हा खरा देशभक्त म्हणत लोक निघून गेले. त्यानंतर काही दिवसांनी कळले की बाबासाहेबांना वेड लागले म्हणून!
बैठ जाय, बैठ जाव, नही मंगता
दादरला कीर्तिकर मार्केटसमोर वसनजी खिमजी यांचा बंगला नि सभोवार सुंदर बाग होती. (आजची डिपार्टमेंटल स्टोअरची जागा.) प्रचारिणी सभेने एक वेळ या बागेत जत्रा निः सभा भरविली. टिळक परांजपे येणारच्या जाहिराती फडकल्या. तुफान गर्दी झाली. अध्यक्षस्थानी वसनजी खिमजी जे. पी. होते. लोकमताला त्यावेळी तुफानी भाषणांची आवश्यकता असल्याचे सिद्ध झाले. तात्विक चर्चा, व्यापारातली आकडेमोड इत्यादी विषयांवर मिळमिळीत बोलण्याचा यत्न करणारे वक्ते फटाफट एकामागून एक असे सोळाजण "बैठ जाय, बैठ जाय, नही मंगता" आरोळ्यांनी लोकांनी एकेक दोनदोन मिनिटांत खाली बसवले. सभा नीट पार पडते का नाही, याचीच पुढाऱ्यांना नि व्यवस्थापकांना काळजी पडली. वामनराव मला बाजूला घेऊन म्हणाले, "काय ठाकरे, काय आहे आजचा रंग?"
मी: अहो, आज लोक लढाऊ वृत्तीत आहेत. त्यांना ही मिळमिळीत भाषणे चालणार नाहीत. दणकेबाज काहीतरी हवे त्यांना, “तुम्हाला ते जमेल का?" त्यांनी विचारताच होय जबाब दिला आणि वसनजीशेठनी वामनरावांना पुढचा वक्ता कोण विचारताच वामनरावांनी माझे नाव सांगितले. आमची पोरसवदा मूर्ती पाहून व्यासपीठावरील सगळ्यांनाच अचंबा वाटला. भलेभले सोळा वक्ते लोकांनी लोळवले. आता हा लुकडा पोर काय करणार? मनात एक तुफानी कल्पनेचे रूपक योजून, ते मी आवेशाने जोरदार भाषेत पहिल्या तडाक्याला उच्चारताच, टाळ्यांचा कडकडाट उडाला. त्यानंतर त्याच जोसात सुमारे दहा मिनिटे बोलून. टाक्यांच्या कडकडाटातच मी मागे सरलो. अण्णासाहेब परांजप्यांनी माझ्या पाठीवर शाबासकीचा हात मारला नि ते उभे राहिले. त्यांनी माझ्याच भाषणातील मुद्यांचा धागा घेऊन तासमर भाषण केले. भले भले गेले, पण या पोराने सभा आज जिंकली असे जो तो बोलत होता. त्या घटनेच्या क्षणापासून अण्णासाहेब परांजप्यांनी मला जो आपुलकीचा लाभ दिला तो त्यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत.
मुंबई सरकारची पाचावर धारण
स्वदेशी चळवळीच्या आंदोलनात ब्रिटिश सत्ता, नोकरशाही आणि ब्रिटिश वस्तू यांच्याविषयी शक्य तितक्या कडाक्याने तिटकारा निर्माण करणे, हे आंदोलकांचे आद्यकर्तव्यच ठरल्यासारखे होते आणि ते साहजिकच होते. सभा, संमेलने, जत्रा, उत्सवांच्या जोडीनेच मुंबईत दररोज नवनवीन शेकडो वर्तमानपत्रे बाहेर पडायची. त्यातली अगदी मोजकीच वाजवी, सरकारी डिक्लेरेशनची असायची, पण बहुसंख्य (एकदोन आठवड्याच्या हयातीची का असत ना) बेलाशक सरकारी कायदे धाब्यावर बसवून बाहेर पडलेली असायची. छापखान्याचे नाव असायचे नसायचे. असेलच, तर त्याचा थांगपत्ता पोलिसांना लागायचा नाही. संपादकाच्या नावाचाही हाच प्रकार. हव्या त्या दिडकी दोन दिडकीवाल्या पत्राची विक्री बोलबोलता व्हायची. सहज चारपाच हजार प्रती तासाभरात विकल्या जायच्या. याकामी गुजराथी तरुण मंडळी बऱ्याच पुढाकाराने सरसावलेली असत. जोरदार मराठी लिहिणारांच्या ते नेहमी शोधात असायचे. त्यावेळी आजच्यासारखी कागदांची आणि छपाईची ताणाताण नव्हतीच मुळी. सांगितले तर खरे वाटणार नाही कोणाला आज, पण क्रौन १६ पेजी फर्म्याच्या चोपड्याच्या १ हजार प्रतींना कंपोज, छपाई, कागद मिळून अवघे १६ रुपये खर्च यायचा.
प्रचारक वक्त्यांच्या धरपकडीपेक्षा, वर्तमानपत्रे, छापखाने जप्त करून, (सापडल्यास) संपादक, मुद्रकांवर राजद्रोहाचे खटले भरण्याचे सत्र इतर ठिकाणांप्रमाणेच मुंबई, पुणे, सातारा, फार काय पण (तेव्हाच्या) खेडेवजा कराडलाही जोरदार चालू होते. लो. टिळक प्रभृतींनी मुंबईला स्थापन केलेल्या `राष्ट्रमत` दैनिकाचा संसार काही महिन्यातच सरकारच्या भक्ष्यस्थानी पडला. इतर भाषिक वर्तमानपत्रापेक्षा मराठी पत्रे नि पत्रकारांवर सरकारची वक्रदृष्टी जबर. भराभर लहानमोठे छापखाने जप्त होऊ लागले.
करुन करुन जप्त करणार काय?
सरकारच्याही घरचे बारसे जेवणारे मगजबाज हिकमती निघाले. याचे एकच उदाहरण देतो. भारकर विष्णू फडक्यांचा `विहारी` हे एक रीतसर डिक्लेअर केलेले साप्ताहिक होते. याच संदर्भात मराठी वर्तमानपत्रांना वेळोवेळी हिकमतीचे सहाय्य देणाऱ्या फाटककाकांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. फाटकांनी सन १८९२ साली `भूत` नावाचे व्यंगचित्रात्मक पाक्षिक चालू केले होते. ते दर आवस पुनवेला बाहेर पडायचे. तेव्हापासून फाटकांचा संबंध या सृष्टीशी असल्याचे ऐकत होतो. मुंबईला आल्यावर प्रत्यक्ष परिचय झाला. मराठी वृत्तपत्रे काढणारे जातीचेच मूळ दरिद्री, आकांक्षा गगनाचा ठाव घ्यायची, पण कडोसरीला कपर्दिकाही नसायची. साळ्याची गाय, माळ्याचे वासरू हा सारा व्यवहार. आणि नेमक्या याच प्रसंगी फाटककाका आपणहून पडेल ते सहाय्य द्यायला हमखास पाठीशी उभे रहायचे. त्यांनी फांदेवाडीत काँन्ट्राक्टर बिल्डिंगमध्ये (आताच्या वागळे हॉलच्या समोर नजीकच) विहारी प्रेस उभा केला.
केला म्हणजे काय केले? चारपाच पै भरलेल्या टायपांच्या केसी आणि एक जुन्या बाजारात मोडतोडके ट्रेडल आणून ठेवले आणि बाहेर विहारी छापखाना अशी भव्य पाटी दिली लटकावून इकडे दामोदरशेट द्यांना गळ घालून त्यांच्या इंदुप्रकाश` छापखान्यात विहारी गुपचुप छापून घेण्याची त्यांनी व्यवस्था केली. झाले. काही दिवसांनी विहारीवर गदा आली. फडक्यांना पकडून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालू झाला आणि विहारी छापखाना जप्त करण्यासाठी खटारे घेऊन पोलीसदळ कांदेवाडीत धावले. बघ्यांची गर्दी उसळली. पोलिसांनी मालकाचा खूप तपास केला. अखेर कुलूप फोडले. दीड आण्याचे कुलूप फोडायला हो काय अवघड? आत पहातात तो काय? लिलावात पाच रुपयेही कोणी देणार नाही. एवढा गडगंज माल! बध्यांच्या टरटिंगलीत बिचाऱ्या पोलिसांना सामील व्हावे लागले. हे सारे नाटक केले नि झाले, पण चुकून एकदाही फाटककाका कसल्याही लफड्यात सापडले नाहीत.
लक्ष्मण नारायण जोशी
हे एक सिद्धहस्त लेखक, कवी, नाटककार तत्त्वविवेचक छापखान्यात हेडशास्त्री होते. हेडशास्त्री म्हणजे मुख्य प्रूफरीडर, त्यांच्या हाताखाली माझा एक जानी दोस्त बाळा मुळे असिस्टंट शास्त्री म्हणून असे. छापखान्यात रगड काम असायचे. बिर्जे यांचे साप्ताहिक सत्यशोधक नटराजन नि जस्टिस चंदावरकरांचे इंडियन सोशल रिफॉर्मर साप्ताहिक छापले जायचे. एक जादा प्रूफरीडर नेमा म्हणून मालकाने सूचना करताच, बाळा मुळयाने माझी शिफारस केली आणि आम्ही शास्त्रीबोवा बनलो. तेथे लक्ष्मण नारायण जोशी ऊर्फ लसूनानांचा सहवास माझ्या वृत्रपत्रीय आणि लेखनीय आकांक्षेला फारच उत्तेजक ठरला. लखूनाना स्वभावाने हौशी, रंगेल आणि मस्करीखोर दररोज निघणाऱ्या नवनवीन हंगामी वर्तमानपत्र काढणाऱ्यांचा नि लखूनानांचा पडदानशीन संबंध मला तेथे समजला.
त्यांनीही मला ते काम पत्करायचा आग्रह केला. फार काय, पण लेख मागण्यासाठी येणाऱ्या अनेकांशी त्यांना माझा परिचय करून देऊन, ती गुप्त संपादकी कामगिरी माझ्याकडे सोपविली. "हे पहा, ठाकरे, दोनचार रुपये मिळतात ना एवढ्या कामावर? पुष्कळ झाले, तुमची खानावळ सुटेल. दणकून लिहीत जा. आपल्या बापाचे काय जाते? हा एक व्यापारच चालू आहे. आणखी वहात्या गंगेत घ्यावे हात धुऊन, नाहीतरी एरवी तुम्हा आम्हाला विचारतो कोण?" लखुनानोऽवाच. माझा पगार पंधरा आणि हे असे बिनचूक मिळायचे पंधरावीस रुपये. रगड झाले त्यावेळी.
लेख राजद्रोही ठरला, संपादकावर वारंट सुटले आणि छापखानाजप्तीचा हुकूम जारी झाला, तरी अखेर काय? आम्ही स्वयंभू नामानिराळे. छापील नावाचा संपादक जन्मालाच आलेला नसायचा आणि छापील नावाचा छापखानाच कोठे नसायचा. पोलिसांची मात्र निष्कारण धावपळ उडायची. लगेच दुसऱ्या नावाने दुसरे पत्र बाजाराच्या नाक्यावर विक्रीस तयार! पण त्यावेळी वृत्तपत्रसृष्टीतल्या संबंधित लोकांची इतकी जबरदस्त एकजूट की पोलिसांनी जंगजंग पछाडले तरी आक्षेपित क्रियेच्या कर्ताकर्माचा लवलेषही त्यांच्या हाती लागायचा नाही. दक्षिणी गुजराथी अगदी एकदिल एकजीव श्रमत झगडत होते.
या चळवळीतील काही विशेष नवलाच्या नि काळया बाजाराच्या कथा मी पूर्वीच लोकमान्य दैनिकात आणि नंतर प्रसिद्ध केलेल्या जुन्या आठवणी या पुस्तकात छापलेल्या आहेत.
अखंड झगड्याचे जीवन
हे सगळे चालले होते खरे. पण हे झगड्याचे जीवन चालणार तरी कोठवर? हातावर मिळवून तळहातावर खायचे तरी किती? नाहीतरी एरवी माझ्याजवळ भरपूर पगारावर कायम नोकरी मिळविण्याचे क्वालिफिकेशन तरी काय होते? घरचा लबेदा मोठा. सणवार उत्सव आले का पैसे पाठविण्याच्या पत्रांचा तगादा पोलिसी कुत्र्यासारखा पाठलाग करायचा.
इतक्यात आजोबांचा मृत्यू झाला. झाले परतलो पनवेलीला त्यांच्या सव्वा सात रुपये पेन्शनीचा किंचित आधार होता, तोही आता नष्ट झाला. सुरू असलेल्या डिक्लेअर्ड दोनतीन साप्ताहिकांच्या व्यवस्थापकांनी आणि प्रामुख्याने इंदुप्रकाशच्या दामोदरशेट यंद्यांनी पनवेलीहून "नियमित काही मजकूर पाठवीत जा. करू थोडीबहुत तुमची सोय" एवढ्याच आश्वासनावर पनवेलला राहून काही हातपाय झाडता येतात की काय, या प्रयत्नाच्या आधारावर पनवेलला घरी जाऊन बसलो. ठाणे येथील जगत्समाचार साप्ताहिक त्यावेळी वासुदेव गणेश ऊर्फ आबासाहेब देशपांडे, हायकोर्ट वकील हे चालवीत होते. त्यांनीही मला साप्ताहिक अग्रस्फुट लेखांच्या पुरवणीबद्दल दरमहा पंधरा रुपये कबूल केले. मात्र हा सारा मेहनताना वसूल करायला दर महिन्याच्या अखेरीला मला मुंबईची वारी करावीच लागे हो. एरवी, गरजू नि तशात मिसरूट न फुटलेल्या लेखकूच्या लेखनदानाची त्यांना कसली पर्वा?
गुरुवर्य दादांचा वरदहस्त लाभला
दादा म्हणजे कृष्णाजी नारायण आठल्ये, केरळकोकीळकर्ते हे त्यावेळी पनवेल येथे वास्तव्य करून होते. पनवेल खांदेश्वर मार्गावर आत्मारामशेट आटवणे यांच्या आंबराईतल्या बंगल्यात ते रहात असत. वर सांगितलेला पोटापाण्याचा लेखन व्यवसाय सांभाळून, दररोज सकाळ संध्याकाळ मी दादांच्या बंगल्यावर जायचा. दादांना सरस्वतीचा पूर्ण वरदहस्त होता. त्यांचे कवितालेखन सहजस्फूर्त एखाद्या पत्रलेखनासारखे ते भराभर करीत. कधीकाळी नाशिकच्या शीघ्रकवी बळवंत खंडूजी पारखांसारखे रसाळ, भाविक नि सज्जन कविमित्र त्यांच्याकडे पाहुणे आले, म्हणजे दोनदोन दिवस नि रात्र त्या बंगल्यात सरस्वतीच्या वीणाझंकाराचा रसाळ कल्लोळ जसा व्हायचा, तसा विख्यात रंगचित्रकार राजा रविवर्मा आला का चित्रकलेच्या नि फोटोग्राफीच्या विविध अंगोपांगांच्या चर्चाचिकित्सेच्या प्रदर्शनाचाही तेथे रंग भरायचा.
अशा वेळी दोनदोन तीनतीन दिवस माझा मुक्काम बंगल्यावरच व्हायचा. दादांचे माझ्यावर पुत्रवत प्रेम असल्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या मोठमोठ्या नामांकित पाहुण्यांजवळ माझ्या गद्यपद्य लेखनाची दादा जिव्हाळ्याने तारीफ करायचे. हा थोरामोठ्यांचा परिचय माझ्या जीवनाला निर्मळ सद्विचारांची आणि नैतिक बैठकीची झिलई देण्यास कारण झाला, हे माझे अमोल भाग्य मी समजतो. दादांच्या सहवासात लेखनकला, काव्यरचना, चित्रकला (तेलीरंगाचे पोर्ट्रेट-पेंटिंग) आणि फोटोग्राफी या कलांचा अलभ्य लाभ मला झाला आणि यापुढे त्या हुन्नरच्या जोरावरच आपण आपले जीवन सफल करावे, हा माझा निश्चय बळावला. हुन्नरी माणसाला बेकारीचे भय नसते. हातावर मिळवून तळहातावरच का होईना, पण खायचे ते हिमतीच्या अभिमानाने खावे, हा माझा बाणा मला हयातभर एखाद्या जानी दोस्तासारखा उपयोगी पडलेला आहे.
"काय? भिंती रंगवायच्या आहेत?"
होय, रंगवितो की. असाच एकदा लेखन-दक्षिणा वसूल करण्यासाठी मुंबईला (दादरला) आलो होतो. येथे राजगुरू हरेश्वर महादेव पंडितांचा बंगला होता. (सध्या तेथे न्यु प्रायमरी स्कूल आहे.) तेथे तळमजल्यावर रावबहादुर बाळासाहेब समर्थ सहकुटुंब रहात असत आणि माडीवर पंडितांचे वास्तव्य असे. उजाडल्यापासून मध्यरात्रीपर्यंत त्यांच्या ज्योतिष्याच्या अठरापगड जातींच्या भक्तांची वरदळ सारखी चालू असे. लक्ष्मी प्रसन्न झाली म्हणजे, ती घरात सारखी रोज कशी वहात धावत येते, याचे प्रत्यंतर मला येथेच दिसायचे. पंडितांना भेटायला जो जो येई. तो तो रुपयांनी, मौल्यवान वस्त्राभरणांनी, निवडक दागिन्यांनी भरलेली तबकेच्या तबके घेऊन यायचा.
पंडितांच्या माडीला तेलीरंग लावण्याचा बूट माझ्या कानांवर आला. अनेक कंत्राटदार त्यांच्याकडे खेटे घालू लागले. मी वर जाऊन हरेश्वरजींना भेटलो. समर्थाकडे नेहमी येणारा पनवेलचा पाहुणा म्हणून मला ते चांगले ओळखत होते, "माडी रंगविण्याचे कंत्राट तुम्ही कोणालाही द्या. पण देवघर रंगवून तेथे देवादिकांची चित्रे रंगविण्याचे काम मला देत असाल तर पहा. छान मनपसंत करून देईन." असे मी विचारले, "अरे वा, तुमच्यात हीही कला आहे का? छान, द्या करून ते म्हणाले. कामाचा आकडा ठरला आणि रंगकामासाठी लागणारा प्राथमिक खर्चही त्यांनी मला दिला. आठ दिवसांत देवघर चारपाच सुंदर तेलरंगी चित्रासह रंगवून दिले. पंडित मंडळी खुष झाली. त्यांनी मला (रंगसाहित्याचा खर्च बाद करता) ७५ रुपये दिले, अरेच्चा, हरहुन्नरीपणा असा संकटकाळी उपयोगी पडतो, या अनुभवाने मला मोठा धीर आला. अहो, तेवढ्या रकमेत माझ्या गरीब कुटुंबाला सहा महिने तरी सुखाचा घास मिळाला, हे काय थोडे झाले?"
गुरुवर्य आठल्यांचे स्वभाव विशेष
दादा आठल्ये सदानकदा कार्यमग्न असायचे. रिकामे बसलेले मी त्यांना कधीच पाहिले नाही. वाचन, लेखन आणि चित्रकला किंवा फोटोग्राफी यांपैकी कोणत्या ना कोणत्या व्यवसायात ते तासन्तास गर्क असायचे. मात्र हे चालत असताना विड्यांच्या खुंडकांची डाव्या बाजूला रास पडायची, विडी उचलायची, पेटवायची, एक झुरका घ्यायचा आणि बाजूला फेकायची हे सारखे चाललेले असायचे. विड्यांचा स्टॉक संपला का खुंडकं पेटवून त्यांचा समाचार घ्यायचा, त्यांचे खरे उत्पन्न मोठमोठ्या लोकांची मोठमोठ्या आकाराची तैलचित्रे रंगविण्याच्या मिळकतीवर असे. केरळकोकीळच्या एडिटरकीबद्दल जनार्दन महादेव गुर्जरांकडून दरमहा ३५ रु. मिळायचे.
मात्र दादांनी लिहिलेल्या आणि गुर्जरांनी छापून प्रसिद्ध केलेल्या अनेक ग्रंथांबद्दल षठीसामासी चारपाचशे रुपये यायचे. कितीही रुपये आले तरी दादांची स्थिती नेहमी ओढग्रस्तीची असे. खडखडाट उडाला म्हणजे ज्यांची काही कामे केली असतील त्यांच्याकडे उधराणीसाठी किंवा आणखी पैसे मागण्यासाठी ते नेहमी माझी शेपाटणी करीत. दररोज दोनशे विड्यांचा पुरवठा पनवेलीहून करण्याचे कंत्राट सकाळसंध्याकाळ मी किंवा माझा चुलतभाऊ दत्तू पार पाडीत असू. एखादवेळेस उशीर झाला का, "अरे माणसाची काही कदर आहे की नाही तुम्हाला? इथं माझा जीव विडीशिवाय चाललाय सकाळपासनं खुंडकावर जगतोय. चल आण इकडे बंडल. वेळेचे महत्त्वच नाही तुम्हाला" ही बक्षिसी ठरलेली.
सरस्वती अखंड प्रसन्न!
एकदा असाच उघराणीच्या नि उसनवारीच्या सफरीवर निघालो होतो. दोन भरोशाच्या ठिकाणी नन्नाचा नारायण भेटला. सकाळी अकरा-बाराची वेळ, पायपिटी करून थकलो. इतक्यात उलव्याहून बोटींचे टांगे आले, जोशी आळीच्या नाक्यावर गिरगावातील विजय छापखान्याचे मालक गणपतराव जोशी उतरले. गणपतराव हे आबा जोश्यांचे जावई. त्यांचा माझा चांगलाच परिचय होता, "काय गणपतराव, आज इकडे कोणीकडे?" म्हणून विचारतो तोच "अरे बरं झालं. मी तुलाच भेटायला मुद्दाम आलो. माझं काम केलंच पाहिजे. हे बघ, तुझ्या दादांनी गुर्जरांना सासरची पाठवणी हे काव्य लिहून दिले आहे. त्या पुस्तकाला बरीच मागणी आहे. तसलेच एखादे काव्य मला लिहून देतील तर पहा. मागतील ते पैसे देतो." ते म्हणाले.
मी : दीडशे रुपये पडतील. आत्ता रोख बयाणा किती देता ते बोला.
गणपतरावांनी पन्नास रुपये रोख दिले. "संध्याकाळी काव्य घेऊन येतो बाकी रक्कम तयार ठेवा" सांगून तसाच तडक उन्हाचा मी बेड्यावर गेलो.
हे पहा दादा तुमच्या सगळया भरोश्याच्या म्हशींना टोणगा झाला. पण एक कूळ हाताला लागले आहे. सासरच्या पाठवणी सारखे तितक्याच तोलामोलाचे एक काव्य लिहून देत असाल तर दीडशे रुपयांची सोय होत आहे. बयाणा पन्नास आणला आहे. "हे ऐकताच दादांनी टाळ्या वाजविल्या आणि जोशात म्हणाले, "अरे, त्याला रे काय उशीर गुर्जरांना सासरची पाठवणी तर जोशाला माहेरचं मूळ. हा बघ बसलोच लिहायला. पण गाढवा एक चूक केलीस येताना भज्याचे पीठ आणायचे होते म्हणजे आपणा दोघांचे जेवण होईपर्यंत भजी नसती का खाल्ली." दादा ताबडतोब टेबलावर बसले आणि भराभर विडयांच्या झुरक्यात काव्य लिहू लागले, एक तासाच्या आत त्यांनी काव्य पुरे केले. आणि मला वाचून दाखविले. मनात म्हटलं, "काय या पुरुषाची तपश्चर्या आहे कोण जाणे. हाक मारताच सरस्वती हात जोडून समोर उभी!"
दादांचे वक्तृत्व अचाट आणि अफाट असे. गंगामठाचे श्री शंकराचार्य पनवेलीला आले होते. त्यांच्या महापाद्यपूजेचा ऐश्वर्यवान समारंभ श्रीमंत बापटांच्या वाडयाच्या चौकात झाला. प्रतिष्ठित नागरिक आणि जनतेने चौक आणि वरील शाळेच्या गॅलऱ्या फुलून गेल्या होत्या. त्यावेळी एक कवितात्मक मानपत्र दादांनी श्रींना अर्पण केले आणि महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि मराठी भाषेचे वैभव या मुद्यांवर दादांनी त्या सभेत सुमारे तासभर रसाळ प्रवचन करून शंकराचार्यासकट सर्वांना अक्षरशः मान डोलवायला लावली. शंकराचार्य तर मधूनमधून साधू साधू असे धन्योदगार काढीत होते. याच सभेमध्ये शंकराचार्यांनी दादांना महाराष्ट्र भाषाचित्रमयूर ही पदवी देऊन आपल्या गळ्यातला पुष्पहार दादांच्या गळ्यात घातला. असे होते माझे गुरुवर्य दादा.
नाथमाधवांची भेट आणि चिरपरिचय
त्यावेळी आलेक्झांड्रा डॉक तयार होत होती. दूरदूरवरचे लहानसहान डोंगर फोडून तेथले प्रचंड दगडधोंडे गोदीच्या भरतीसाठी आणण्याचा धुमाकूळ उडाला होता. शेकडो कंत्राटदार या कामी खपत होते, उलवा बंदराजवळच्या एका टेकडीला सुरुंग लावून तेथील प्रचंड शिळा गलबतांनी मुंबईला पोचविण्याचे काम जोरात चालू होते. चारपाचशे मजूर, दहाबारा कामदार सारखे तेथे खपत होते. एक वसाहतच झाली होती ती. अनेक कंत्राटदार काम टाकून पळाले होते. एक गेला का दुसरा यायचा. त्या कामावर माझे एक स्नेही पालीचे माधवराव कारखानीस होते. ते कंत्राट अखेर गिरगावातील माधवाश्रमाचे जनक धोंडोपन्त सावले यांनी घेतले. तेही माझ्या दाट परिचयाचे असल्यामुळे मी वरचेवर पनवेलीहून उलव्याला एकदोन दिवसांच्या मुक्कामासाठी येत असे. बोटीच्या वेळेला अर्थात धक्क्यावर मी जायचाच. कारण त्या खेड्याला तेवढ्याच एका योगाचे आकर्षण.
एक दिवस बोट आली. धक्क्याला लागली. पॅसेंजर उतरले आणि चढले पण बोट काही सुटेना. काय भानगड आहे म्हणून पाहतो तो वेताच्या शिसवी आरामखुर्चीवर एक नट्टापट्टा केलेला आकडेदार मिशांचा सुदृढ तरुण स्मितहास्य करीत बसलेला, त्याच्या अंगाभोवती शाल गुंडाळलेली आजूबाजूला दोनतीन बाया आणि मुंबईकर सोकाजीटाईप दोनतीन तरुण. ती खुर्ची त्या तरुणासकट बाहेर धक्क्यावर आणून ठेवण्यासाठी खलाशांचा आटारेटा चाललेला होता. बोट आणि धक्का यांच्यामध्ये कठड्याची शिडी होती. तिच्यावरून हे प्रचंड लफडे उचलून आणायचे होते.
चौकशी करता काही म्हणाले, "एका आजारी इसमाला खलाशी बाहेर धक्क्यावर काढताहेत. मी म्हटले, हा तर चांगला धट्टाकट्टा इसम दिसतोय, हसतोय खिदळतोय. याला काय घाड झाली आहे?" आरामखुर्ची धक्क्यावर येऊन बसली. भोंगा वाजवून बोट सुटली. आलेले ऊतारू घेऊन पनवेलचे टांगे केव्हाच पसार झाले होते. दोन टांगेवाले मात्र त्या आजारी माणसाच्या बरोबर आलेल्या इसमाशी भाड्याची हेंगल घालताना मला दिसले. मी तेथे गेलो आणि काय भानगड आहे? म्हणून विचारले. तो गृहस्थ म्हणाला, "माझे नाव खंडेराव पितळे. माझा धाकटा भाऊ द्वारकानाथ सिंहगडावर शिकार करताना कड्यावरून कोसळला. त्याचा स्पायनल कॉर्ड ठेचला जाऊन कमरेखालचा भाग निकामी झाला आहे. त्याला औषधोपचारासाठी धूतपापेश्वरकडे घेऊन चाललो आहोत. बरोबर आमची मातोश्री. माझी पत्नी आणि मुलगी एवढी आहेत. आम्हाला तेथे बराच काळ रहावे लागेल असे वाटते. पण हे टांगेवाले काही भलतेच भाडे मागताहेत."
त्या तीन टांगेवाल्यांत पनवेलचा इबला टांगेवाला होता. मी त्याला म्हटले, "इबला, परगावच्या पाहुण्यांची अशी अडवणूक करून गावाची अब्रू घालवायची आहे काय?" अखेर इबलाच्या टांग्याचे टप काढून वर आजाऱ्यासकट खुर्ची बाधायची या कामाबद्दल पाच रुपये ठरवून बाकीच्या दोन टांग्यांत इतरांची व्यवस्था केली. मी खण्डेरावला म्हटले, "तुम्ही पनवेलला हे मल्याण घेऊन जाणार आणि उतरणार कुठे? धूतपापेश्वर कारखान्यात तशी काही सोय नाही." त्यांनाही या अडचणीची अटकळ होती. आलेल्या मंडळींची श्रीमंत शंकरशेटच्या नव्या बंगल्यात उतरण्याची सोय करावी अशी मी आत्मारामशेट आटवण्यांना चिठ्ठी लिहिली आणि ती घेऊन मंडळी पनवेलीला रवाना झाली.
काव्यशास्त्रविनोदेन
श्रीमंत आत्मारामशेटनी नाथमाधवाच्या कुटुंबाची सोय प्रथम शंकरशेटच्या नव्या हवेलीत माडीवर केली आणि थोडयाच दिवसांनी त्यांना वडाळा तळ्यावरील आपल्या नंदनवनी बागेच्या बंगल्यात रहाण्याची व्यवस्था लावली. सकाळसंध्याकाळ माझी बैठक तेथे होऊ लागली. कमरेपासून खालचा सगळा भाग ठेचाळला गेला होता. त्यावर धूतपापेश्वरच्या कृष्णशास्त्री पुराणिकांनी उपाय सांगितला तो असाः नारायण तेलाने सकाळी तो भाग खूप मर्दन करायचा आणि नंतर रोग्याला पाचसहा तास कमरेपर्यंत नाचणीत गाडून ठेवायचे. त्यासाठी एक मालीशवाला नोकरीला ठेवला आणि सुताराकडून एक पेटी तयार करून घेतली. तीतल्या बैठकीवर नाथाला बसवायचे आणि छातीपर्यंत नाचणीची पोती ओतून चकडबंद पुरायचे. पुढे लिहिण्यावाचण्यासाठी एक फळी आणि मागे टेकायला मऊ उशी, असा थाट अनेक महिने चालला होता.
मुंबईहून बंधू खंडेराय काही इंग्रेजी मासिके कादंबऱ्यांची पुडकी दर शनिवारी घेऊन यायचे. त्यांच्या वाचनात नाथाचा वेळ जायचा. नंतर त्यांतील काही लघुकथांच्या आधाराने मराठी छोट्या गोष्टी तो लिहू लागला. ज्या गोष्टी त्याला बऱ्या वाटायच्या त्या तो काही तत्कालीन मासिकांकडे `लेखक द्वारकानाथ माधव पितळे` या सहीने प्रसिद्धीसाठी पाठवायचा. बहुतेक गोष्टी साभार परत यायच्या.
असे का व्हावे? यावर आम्ही दोघांनी खूप खल केला. पितळे आडनावावरून एडिटर महाशयांना जातीचा वास येत असावा. पितळे म्हणजे दैवज्ञ सोनार. हा ठोकडा काय लेख लिहिणार? अशी काहीतरी विकल्पाची भावना प्रतिष्ठित समाजातील एडिटर महाशयांना येत असावी. आणि हा असला विकल्प त्याकाळी बराच होता. आज नाके मुरडण्यात काही शहाणपणा नाही. त्यावर आम्ही तोडगा काढला. द्वारकानाथ नावातला नाथ आणि वडलांचे `माधव` नाव यांचा संधी `नाथमाधव` असा करून कथागोष्टी पाठविण्याची सुरुवात केली.
आणि काय चमत्कार पहा नागपूरचे श्री. गडकरी यांचे महाराष्ट्र साहित्य किंवा वाङ्मय अशाच नावाचे मासिक आणि कै. का. र. मित्र यांच्या मनोरंजन मधून नाथमाधवाच्या गोष्टी सुरळीत प्रसिद्ध होऊ लागल्या. तेव्हापासून नाथमाधव हे नाव चालू झाले ते त्यांच्या अखेरीपर्यंत. लेख लिहिण्यासाठी नाथाला मी वापरीत असलेल्या जांभळ्या शाईची जी दीक्षा दिली, ती त्याने अखेरपर्यंत बिनचूक कटाक्षाने पाळली. पनवेल येथे असतानाच नाथाच्या `सायंकाळच्या गप्पा` किंवा गोष्टी हे पुस्तक प्रसिद्ध झाले.
विठोबा खंडाप्पा बागेतील नाथमाधवाचे वास्तव्य चांगले वर्षभराचे झाले असावे. दादा आठल्ये नित्यनियमाने सायंकाळी तेथे यायचे. गावातील काही विद्वान, वकील, मामलतदार यांचीही छावणी थाटायची. त्यामुळे दररोजच्या सायंकाळी तेथे काव्यशास्त्र-विनोदांच्या मैफलीवर मैफली झडत असायच्या. याशिवाय, नाथमाधवाचे शारीरिक व्यंग चुटकीसरसे बरे करून दाखविण्यासाठी तांत्रिक, मांत्रिक, जडीबुट्टीवाले किती आले नि किती गेले, त्यांची मोजदाद नाही. सारे लेकाचे त्याला आरपार लुबाडून जायचे. तसल्या गोष्टींवर त्याचा किंवा आम्हा कोणाचाही विश्वास नव्हता, पण नाथाच्या वृद्ध मातोश्रीला मोठी आशा. "अरे बाबांनू तुका म्हणे भोग सारे, गुणा येताती अंगारे" असे ती म्हणायची. तिचा शब्द तो खाली पडू द्यायचा नाही. होम करायचा? करा. हा घ्या खर्च, जाण्यायेण्याचा आणि रोजच्या पुण्याचा खर्च असायचाच. विलक्षण आजाराच्या या निमित्ताने नाथमाधवाची (त्याच्या वाट्याला आलेल्या) मुंबईतील घरादारांची नि दागदागिन्यांची सफाचाट चटणी उडाली. बंधू खंडेरावालाही तशीच तोशीस सोसावी लागली आणि सगळे उपाय हरल्यावर, पुढचे सारे आयुष्य लेखणाबाईच्या आराधनेवरच काढावे लागले.
मी नाटक व्यवसायात शिरलो
पाठीमागे वाडवडिलार्जित लक्षुबाईचा काहीही उबारा नसला म्हणजे महत्त्वाकांक्षी तरुणाला समोर दिसेल तो चोख मार्ग चोखाळून कुटुंबरक्षण कसे करावे लागते, याचे दाखले माझ्या जीवनात मी भरपूर घेतलेले आहेत. मात्र कोणताही मार्ग पत्करण्यापूर्वी मातोश्री ताई नि आजी यांचा सल्ला घ्यायला मी कधीच चुकलो नाही.
वृत्तपत्री किरकोळ लेखन करीत असताना, मी एक संगीत नाटक लिहिले. अनेकांना वाचून दाखविले. योगायोग काय आला पहा. नेमक्या त्याच वेळी कै. श्री. वासुदेवराव जोशी यांची सांगलीकर स्त्रीमिश्रित साग्रसंगीत नाटक मंडळी पनवेलला आली. एके दिवशी सकाळी गेलो त्यांच्या भेटीला. त्यांनी दुपारी तालमीच्या वेळेला नाटकाचे वाचन करायला बोलावले. तालीम बंद ठेवून माझ्या नाटकाचे वाचन सर्व मंडळींसमोर झाले. दुसऱ्या दिवशी तुमचे नाटक आम्हाला पसंत आहे, आम्ही ते घेतो, असे वासुदेवरावांनी सांगितले. ३५० रुपये मानधन ठरले आणि ५० रुपये त्यांनी रोख बयाणाही दिला. रुपये ताईला द्यायला गेलो, तो ती म्हणाली. "हे सारे खरे कशावरून? त्या जोश्यांना आण माझ्याकडे, मी चौकशी करीन नि मग याला हात लावीन." त्याप्रमाणे वासुदेवरावांना संध्याकाळी घरी घेऊन आलो, त्यांनी खुलासा केला आणि येथून जाताना आम्ही यांना कंपनीबरोबरच घेऊन जाऊ हेही सूतोवाच केले.
काय? रांडांच्या कंपनीत?
वासुदेवराव जोश्यांची नाटक कंपनी स्त्रीमिश्रित होती. त्याकाळी नाटकांत कामे करणाऱ्या बायांना रांडा हीच जाहीर संज्ञा असे. नाटकांत काम करणाऱ्या आजकालच्या स्त्रिया देवी म्हणून भजल्या पूजल्या जातात, पण त्याकाळी रंगभूमीची मनोभावे सेवा करणाऱ्या त्या बायांचा रांडा असा उद्धार होत असे. कंपनीबरोबर मी जाणार, असे गावभर होताच रिकामटेकड्यांना माझ्या सहानुभूतीचा पाट फुटला. एरवी जे कधी आमच्या गृहावस्थेची चुकूनही चौकशी करायचे नाहीत, त्यांनाही माझ्या भवितव्यतेच्या विवचनेने अस्वस्थ केले. "काय, ताई, रांडांच्या कंपनीत मुलाला पाठवणार?" म्हणून जो तो नि जी ती विचारू लागली.
"का बरं? आजच तुम्हाला आमच्या घरातल्या भानगडींचा एवढा पान्हा फुटला हो? दादा काय करतो. कसं काय चाललं आहे वडील आजोबा गेल्यापासन, असे नाही हो कधी तुम्ही विचारायला आलात नि आजच कसा तुम्हाला एवढा आमचा पान्हा फुटला? हे बघा दादाला मी जे शिकवलं आहे नि जी शिस्त लावली आहे, त्यावरून तो भलत्यासलत्या मार्गाला चुकूनही कधी जाणार नाही, ही माझी खात्री आहे. तशात गेलाच, तर काय सांगणार? तो पुरुष आहे. तुम्ही कसे रांडांची कंपनी आली का झुंडीने नाटकाला घुसता? खरं ना हे? रोजगाराचा मार्ग दाखवायला कोणी नाही यायचे नि टीका करायला मात्र सगळे." या शेऱ्याने ती प्रत्येकाला चमकवायची.
पाचसहा वर्षे तरी माझी अनेक नाटक कंपन्यांत वसती झाली. ठराविक तालीम मास्तरांच्या जोडीने मला काम सांगण्यात येई. कित्येक वेळा नवीन आलेल्या नाटककारांच्या नाटकांत आणि पद्यरचनेतही योग्य ती सुधारणा करण्याचे काम दिले जात असे. या क्षेत्रात शिरल्यामुळे मला सारा महाराष्ट्र अगदी जवळून अभ्यासता आला. या नाटकी जीवनाच्या अनेक आठवणी मागेच मी `लोकमान्य` दैनिकात आणि मार्मिक साप्ताहिकात छापल्या.
प्रकरण ७
देशाटनात ज्ञानवृद्धी
नाटकात घुसलो नसतो तर अनायासे महाराष्ट्र पर्यटनाची संधी मला खास मिळाली नसती. नाटक मंडळीत सर्वसाधारण अल्पशिक्षितांचा भरणा मोठा. त्याच व्यवसायात बहुतेक गुरफाटून राहणारे. मी मात्र पूर्वीपासूनच ज्ञानार्जनाच्या व्यसनात मग्न असल्यामुळे, ठिकठिकाणी साहजिकच अनेक विद्वान नि पुढारी मंडळींच्या संपर्काचा ज्ञानसिद्ध हक्कदार होत असे. त्यांचा स्नेह मला पुढील आयुष्यात उपयोगी पडला. ज्या शहरात अथवा गावात कंपनीची छावणी पडत असे, तेथील लोकांचे जीवन काय, व्यवसाय कोणकोणत्या प्रकारचे, पहाण्यासारखी ऐतिहासिक स्थळे कोणती, त्यांचा इतिहास काय, शिक्षण संस्थांना गाठीभेटी, इत्यादी संशोधकी वृत्तीने आणि स्थानिक परिचित अशा मोठ्या लोकांच्या सहाय्याने किंवा मध्यस्थीने मी सारखा असायचा.
चंद्रभागेच्या पुरात सापडलो
वासुदेवराव जोश्यांच्या सांगलीकर नाटक मंडळीत मी प्रथम गेलो तो पंढरपूरच्या मुक्कामात. त्यावेळी चंद्रभागेच्या पैलतीरावर रेल्वेचे स्टेशन होते. कंपनीची छावणी नदीकिनारीच असलेल्या परांजपे थेटरात आणि एक शाखा गावात. तो आषाढाचा महिना होता. पंढरपूर यात्रेकरूंनी अगदी ठेचून भरले होते. रोज सारखे भरतच होते. इतक्यात चंद्रभागेला पूर आला आणि पाणी गावात शिरले. पहिला तडाखा थेटरला बसला. भराभर पाणी आत घुसू लागले. खड्ड्यातील खुर्ची बाकेच काय पण रंगभूमीवर टांगलेले पडदे आणि आजूबाजूला साठविलेले अनेक देखाव्यांचे पलॅट्स माडीवर नेण्याची साऱ्याच मंडळींची धावपळ चालू झाली. पाण्याचे लोंढेच्या लोंढे थेटरात घुसू लागले. सभोवारचा प्रदेश जलमय झाला.
अर्ध्या तासाच्या आतच थेटरचा पहिला मजला बुडाला. सारा व्यवहार बंदिस्त अवस्थेत माडीवर होऊ लागला. तशात गावात पटकी फैलावली. होड्या फिरू लागल्याच, पण प्रेतेही तरंगताना आढळू लागली. माडीबाहेर तोंड काढण्याची सोय उरली नाही. जेवणाचा मेन्यूही बदलला. सपाटून उकडलेला भात आणि आमटी एवढ्यावरच काम भागविण्याचे मालकांचे फर्मान सुटले. जो तो सकाळसंध्याकाळ बर्मनचा कर्पूरार्क चाटू लागला. कॉलऱ्यावर तोच एक उपाय ठावा होता. बाकी म्युनिसिपालिटी तरी अधिक काय करणार? आत्ताच्यासारखी व्यवस्था तेव्हा थोडीच होती? जगणारे जगतील, मरणारे मरतच आहेत, पंढरीनाथाची इच्छा. यापेक्षा अधिक कोणाला काहीच करता येत नसे.
अनाथ बालकाश्रमातला पाहुणचार
आम्ही असे माडीबंद अवस्थेत असतानाच, एक दिवस सकाळी आठच्या सुमाराला एक गृहस्थ होडी घेऊन थेटराच्या पहिल्याच मजल्याच्या गॅलरीच्या बंदराला लागले. "कंपनीत ठाकरे आले आहेत ना? मला त्यांना भेटायचे आहे." असे ते विचारू लागले. पंढरपूरला मी नवखा नि हा कोण गृहस्थ माझी चौकशी करायला आला बुवा? मी विचारात पडलो. खरं म्हटलं तर त्याकाळी मी अधूनमधून वर्तमानपत्रांत लिहीत असे. यापेक्षा महाराष्ट्रात मला कोणी फारसे ओळखत नसे. ते गृहस्थ मला पहाताच म्हणाले, "माझे नाव केरो रावजी भोसले. आपला माझा परिचय नाही. एक मराठी लेखक म्हणून काय तो मी आपल्याला ओळखतो, आपण इथं आल्याचे मला आपल्या कंपनीच्या गावातल्या शाखेच्या लोकांकडून काल रात्री समजले. आपण आपले बाडबिस्तर घेऊन आत्ताच्या आत्ता आमच्या अनाथ बालकाश्रमात रहायला चला. होडी आणली आहे. मी आश्रमाचा सुपरिंटेंडंट आहे. कंपनीची मंडळीही तिथं जवळच आहेत." केरोबांनी तात्काळ माझ्या सामानालाच हात घातला आणि "चला, आता उशीर नको. पाणी सारखे वाढत आहे", असे म्हणत मी आणि काका विनायकराव यांना होडीत घेऊन ते निघाले. या अकल्पित घटनेमुळे, मला तेथील अनाथ बालकाश्रमात एका अत्यावश्यक सामाजिक सेवेच्या क्षेत्राचा खास परिचय घेण्याची संधी मिळाली. सुमारे पंधरवडाभर मी आश्रमाचा पाहुणचार घेतला.
विजापूरने विचार क्रांती केली
शिवाजीचा शत्रू विजापूर. म्हणून शालेय इतिहासाच्या अभ्यासामुळे, मला त्या गावाबद्दल एक तिटकाराच वाटायचा. पंढरपूरचा कंपनीचा मुक्काम विजापूरला छत्रे थेटरात गेला. आजूबाजूला पहातो तो सारा कानडी भाषेचा सुळसुळाट. तरीही तेथे काही मऱ्हाठी मंडळी भेटलीच. सभोवार यंडुगुंडु भाषेचा गडबडाट अहोरात्र चालला असता. अचानक कोणी आपल्याशी शुद्ध मराठी भाषेत बोलायला आला म्हणजे होणारा आनंद अक्षरशः अवर्णनीय. एक दिवस असेच कै. केशवराव गणेश खारकर नावाचे एक हसतमुख गृहस्थ माझा शोध घेत घेत छत्रे थेटरात आले. एक सहृदय कवी आणि सत्यकथा लेखक म्हणून फक्त नावाने मला ते परिचित होते. ते पी. डब्ल्यू. डी. मध्ये हेडक्लार्क होते. त्यांनी लगेच भोजनासाठी मला आपल्या बिऱ्हाडी नेले. केशवरावांचा येथे झालेला परिचय आणि स्नेह त्यांच्या हयातीनंतरही त्यांच्या चिरंजीवांनी आजवर अखंड पाळलेला आहे. केशवराव खारकरांच्या सोबतीमुळे, मला विजापूर राजधानीतील सगळी ऐतिहासिक स्थळे बोलघुमट, इब्राहीम रोझा, आसार महाल, मेहतर महाल, उपल्या बुरुज, तास बावडी आणि ती दर्शनीय मुल्क मैदान ऊर्फ महांकाळी तोफ इत्यादीचे इतिहासासह साग्र दर्शन घेता आले आणि विजापूर हे प्रत्येक मराठी इतिहासाभ्यासूने अगत्य भेट देण्याचे एक स्थान आहे, या साक्षात्काराने माझे त्या शहराविषयीचे सारे विकल्प लयाला गेले.
अनेक वेळा मी त्या ठिकाणांना भेटी दिल्या. उपल्या बुरुज अंदाजे दोन ताडभर तरी उंच आहे. बिनकठड्याच्या बाहेरच्या बाजूच्या अरुंद पायऱ्यांवरून चढून जाणे, ही एक कसरतच म्हणावी लागेल. वर जात असताना खाली पाहिले तर नजर तरळते. पण माथ्यावर पाऊल ठेवताच तेथे पडलेल्या दोनतीन प्रचंड तोफा पाहून तर मी सर्दच झालो. जिथे माणसाला वर चढायला एवढी कसरतच करावी लागते, तेथे या तोफा वर चढविल्या असतीलच कशा या आश्चर्याचे समाधान होतच नाही. उपल्या बुरुज शहराच्या मध्यभागी आहे. विजापूरचा प्रदेश सारा सपाट. लहान टेकडीही कोठे दिसायची नाही. सूर्योदय नि सूर्यास्त भूभागावरच होतात. असले राजधानीचे शहर, त्याचे परचक्रापासून संरक्षण वेळच्या वेळी आणि नेमदार व्हावे. एवढ्यासाठी सुलतानांनी तो बांधला. दूरवर गनिमाच्या आक्रमणाची नुसती चाहूल लागली पुरे. का बुरुजावरून चौफेर तोफांचा भडिमार करता येत असे, अशी योजना होती. विजापूरला टेकडी नाही, म्हणून बुरुज उभा करून आक्रमणाचा बंदोबस्त केला. पण पुण्याला आयती पर्वतीसारखी टेकडी निसर्गतःच लाभली असताना, पेशव्यांनी काय केले? तर तेथे देवळे आणि वरणभाताचे हौद उभारले.
इब्राहीम रोझा मशिदीच्या बाहेरच्या पारपिटा (पॅरापेट्स) सलग दगडाच्या आहेत आणि त्या दगडांतूनच उफाळलेल्या कमळाच्या तोंडाच्या एक दोन साखळ्या लोंबताना दिसताच, इस्लामी कारागिरीबद्दल आणि सुलतानांच्या अभिरुचीबद्दल कौतुक न वाटणारा सवै मुक्तोऽथवा पशूच मानावा लागेल, आसार महालात भिंतीवर तेली रंगाने रंगविलेली अनेक चित्रे होती. गारवेलीच्या निळसर फुलांची चित्रे तर प्रत्यक्षासारखी. काही स्त्रियांची चित्रे होती. मुखवटे फोडून त्यात चुना भरला होता. हा सारा पराक्रम औरंगजेबाचा. आसर महालात बैठकीचा एक गालिचा पाहिला. त्याची घडी घालून एका कोपऱ्यात ठेवली होती, तीच मुळी एक पुरुष उंच होती. असे एकेका ठिकाणचे वर्णन किती करावे? विजापूरचा दोन महिन्यांचा मुक्काम म्हणजे मला इतिहासाचे एक विद्यापीठच वाटले. हल्ली शाळा कॉलेजातील विद्यार्थ्यांच्या सहली दूरदूरवर जातात. त्यांनी मुद्दाम विजापूर राजधानीचे गतवैभव अगत्याने अभ्यासावे पहावे, अशी माझी शिफारस आहे.
नाटक मंडळींचा हितकर्ता बच्चू मास्तर
बच्चू मास्तर देहाने जसा अवाढव्य तसा मनाने विशाल. त्याच्या हृदयाची श्रीमंती अफाट, जीआयपी रेल्वेचा ट्राफिक कॅन्व्हासर असल्यामुळे, मुंबई ते नागपूर-जबलपूर आणि दक्षिणेकडे थेट वाडी जंक्शनपर्यंत सारखा फिरतीवर असायचा, एम्पायर हिंदू हॉटेलमध्ये त्याची एक बिऱ्हाडाची कायमची खोली असे. तेथे सकाळ-संध्याकाळ पंगतीला दोनचार पाहुणे असल्याशिवाय त्याला बरे वाटायचे नाही. शिवाय बच्चू मास्तरचा जेवणाचा बेतही खास असायचा नि आरडरप्रमाणे तो एम्पायरवाल्यांना तयार ठेवावा लागे. मुंबईत आलेला ओळखीचा कोणी कुठेही भेटो, बच्चू मास्तरने खेचलाच त्याला पाहुणा म्हणून आपल्या खोलीत. दिवस-रात्रीतून पाहुण्यासाठी चहाच्या आरडरी किती सुटायच्या, त्याचा नेम नाही. हीनदीन भेटला का त्याने त्याची हाक मारून चौकशी करावी नि शक्य ती मदत देऊन त्याला वाटेला लावावे, हा त्याचा मनोधर्म. त्यामुळे त्याच्या या उदारपणाचा अनेक लफंग्यांनी गैरफायदा घ्यावा. त्याबद्दल आपण काही बोललो, तर "फसवी ना तो मला! मला वाटले म्हणून खिशात होते तेवढे पैसे दिले त्याला, मनाचे समाधान ही काय लहानसहान चीज आहे?" असे तो म्हणायचा.
सर्वत्र सारखी भटकती असल्यामुळे, बच्चूच्या ओळखीचे क्षेत्रही विशाल रेल्वेच्या पोर्टरांपासून तो गावोगावच्या मोठमोठ्या व्यापारी कंत्राटदारांपर्यंत बच्चू मास्तरचा शब्द बेअरर चेकसारखा दर्शनी वटायला जायचा, त्याच्या या स्नेहाळ वर्तनामुळे साहजिकच महाराष्ट्रातल्या बहुतेक नाटकमंडळ्यांचा तो कायम पुरस्कर्ताच होऊन बसला होता. नाटक व्यवसायात रेल्वेच्या अडचणी अनेक आणि खुद्द नाटक मंडळ्यांच्या अडीअडचणी काय थोड्याथोडक्या असायच्या! मुक्काम हालवायचा तर गुड्ज डबे वेळेवर मिळण्याची पंचाईत. डबे हजर असले तर चार्ज भरायला खिसा रिकामा. मुक्काम तर हालवायलाच पाहिजे. सगळाच खडखडाट गावकऱ्यांची देणी टुमणी लावून दाराशी बसलेली.
अशा वेळी बच्चू मास्तरला तार करून बोलवायचे, तार मिळताच स्वारी हजर कंपनीची रेल्वे डब्याबाबतची अडचण तर नुसत्या हुंकाराने दूर व्हायचीच, पण देण्याघेण्याच्या बाबतीतही तडजोड समझोता होऊन, कंपनीची पुढल्या मुक्कामावर आबादाबात पाठवणी करूनच मग तो आपल्या फिरतीवर जायचा. बहुतेक कंपन्यांचा तो एक हुकमी आधार होता. एखाद्या हौशी नवीन कंपनीला चांगले पडदे-कपडे नाहीत, असे दिसले तर बच्चू मास्तर कोणा ना कोणा कंत्राटदाराला मथवून त्यांची सोय करायचा. हे सारे करीत असताना चुकून सुद्धा कधी कोणाकडून त्याने प्रत्युपकाराची अपेक्षा केली नाही. सगळे व्हायचे मिटल्या तोंडी अडचणीत अटकलेल्या एखाद्या कंपनीची सुटका अचानक झालेली गावकऱ्यांना दिसायची, पण ती कशी नि कोणी केली, याचा कोणालाही मागमूस लागायचा नाही.
आजकाल मयत नट-नटींचे पोवाडे सगळेच गातात. पण जुन्या जमान्यात अनेक नाटक कंपन्यांना संकटकाळी मदतीचा हात देऊन त्यांचे तारणकर्त्या बच्चू मास्तरसारख्या उदारधी स्नेह्यांचे स्मरण कोण करणार?
कृष्णराव गोरे यांचे ग्रामोफोन रेकॉर्डिंग
स्वदेशहितचिंतकांचा मुक्काम अमरावतीला होता. बच्चू मास्तर एकदा तेथे आला असता. कृष्णराव मोरे यांच्या गायनाचे रेकॉर्डिंग करण्याबाबत माझे नि त्यांचे बोलणे झाले. त्या आधी मी हिज् मास्टर्स व्हॉइस कंपनीबरोबर पत्रव्यवहार चालू ठेवला होता. बच्चू मास्तर मुंबईला गेल्यावर, त्याने कंपनीच्या मालकाला भेटून कंत्राट ठरवले. बारा गाण्यांचे रु. तीनशे एक मॉनर्क ग्रामोफोन मशीन, बारा निवडक रेकॉर्डस्, जाण्यायेण्याचा दोन माणसांचा सेकण्ड क्लास प्रवासखर्च, असे ते कंत्राट ठरले. एका बुधवारचा खेळ संपवून मी आणि कृष्णराव मुंबईला आलो.
आम्ही सकाळीच एम्पायरमध्ये येऊन दाखल झालो. बच्चू मास्तरने आमचेही कंपनीशी फोनाफोनी केली. कंपनीचे रेकॉर्डिंग खाते अगदी नजीक, म्हणजे सध्याच्या भाटीया बागेच्या बाजूलाच पुरोहित हॉटेल (त्यावेळी गोखले हॉटेल) होते, त्या इमारतीच्या माथा मजल्यावर होते, आम्ही तेथे गेलो. कितीतरी पारशी, गुजराथी कलावंत तेथे जमले होते. त्यावेळची रेकॉर्डिंगची पद्धती सध्यासारखी सुटसुटीत नसे. एक गोरा आदमी गायक टोळीला यंत्ररचनेसमोर बसवायचा. जाड पुठ्याची नळकांडी-एक गायकाच्या अगदी तोंडाजवळ, एक हार्मोनियमजवळ एक तबल्याजवळ अशी वळवून लावायचा. एक इंच जाड भाकरीएवढी चाकोलेटी रेकॉर्ड यंत्रावर चढवायचा.
"देखो, बहोत जोरसे गाना चाहिये" असे बजावायचा आणि हाताचे सिग्नल देऊन करा सुरू सुचवायचा. गाणे संपले का तीच भाकर तो यंत्रावर वाजवून पहायचा नि लगेच पास-नापास जजमेण्ट द्यायचा. एकदा ट्रायल म्हणून जाडी रेकॉर्ड वाजवली. का गेली ती फुकट. मग तिचा काही उपयोग नाही. असले चमत्कारिक तंत्र होते ते रंगभूमीवर चार-चार, पाच-पाच वन्समोर घेऊन तीस-तीस चाळीस-चाळीस गाणी ठासून गाणारेसुद्धा अवधी दोन-तीन गाणी रेकॉर्ड होताच दमछाटीने बाजूला बसायचे. कृष्णराव गोरेसारखा दणक्या गवयी त्या काळी मराठी रंगभूमीवर दुसरा कोण होता? पल्लेदार गोड स्वरांची त्यांची गाणी लोक थेटराबाहेर उभे राहून ऐकायचे. पण रेकॉर्डिंगच्या वेळी
पहिल्या टेस्टलाच गोरे नापास?
नरडे ताणून ठासदार गायला, तरीही म्हणे "टू स्लो है. रेकॉर्ड नहीं बनेगी." आता एवढे अमरावतीहून आलो नि आता? प्रवासखर्च तरी मिळतो का नाही? पण त्या गोऱ्या साहेबाने उत्तेजन दिले. नुकतेच तुम्ही प्रवासाने आलात. आजच्या दिवस विश्रांती घ्या. उद्या पुन्हा टेस्ट घेऊ.
त्रिकोनी चेहरे करून आम्ही एम्पायरमध्ये आलो. मी बेचैन झालो, कारण या सगळ्या खटपटी प्रथमपासून मीच चालविलेल्या होत्या. तसाच बाहेर पडलो नि काळबादेवी रोडवर `जेम्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी` नावाचे एक वाजिंत्र वाद्ये विकण्याचे दुकान होते तेथे गेलो. तेथला मॅनेजर एक वृद्ध पारशी मि. जमशेटजी म्हणून होता. त्याची माझी जुनी ओळख. ती जेम्स कंपनी सिंगर ग्रामोफोन रेकॉर्डस् तयार करीत असे. "हे पहा, जमशेटजी, महाराष्ट्राचा नामांकित गवई कृष्णराव गोरे येथे आलेला आहे. तुमच्या सिंगर रेकॉर्डसाठी त्याची गाणी घ्यायची असतील, तर आजच्या आज संधी साधली पाहिजे. कारण, उद्या सकाळी वऱ्हाडात परत जाणार आहे." मी म्हणालो, जमशेटजीने लगोलग मालकाला बोलाविले आणि सौदा ठरला. तीनशे रुपयांत बारा गाणी. जमशेटजीला घेऊन तसाच एम्पायरमध्ये आलो नि गोरे यांना एक गाणे गाऊन दाखवायला सांगितले. तंबोरा लावलेलाच होता. त्यांनी वळते अंजुलि नकळत बघुनि तुम्हालागी "हे तात्यासाहेब कोल्हटकरांचे मालकंसातले गाणे टास आवाजात गाऊन दाखवले. जमशेटजी खुष झाला. रात्री दहा वाजता रेकॉर्डिंग ठरले."
ग्रांटरोड पुलाला समांतर असलेल्या एका बंगल्याच्या तळमजल्यावरचे ठिकाण. बच्चू मास्तरसह आम्ही सगळे तेथे गेलो. जाताना बच्चू म्हणाला, "पण काय रे एचेम्व्हीला आपण लिहून दिले आहे की त्यांच्याकडे रेकॉर्डिंग झाल्यावर इतर दुसरीकडे गाणी देणार नाही म्हणून ते?"
मी : अन् समजा, उद्या तेथे आजच्यासारखेच टू स्लो इम्पॉसिबल झाले तर? मग आत्ताचा हा बार सोडणार कोण? उद्याचे उद्या. असल्या अटी मी पुष्कळ पाहिल्या आहेत, चला.
बारा गाणी व्यवस्थित रेकॉर्ड झाली. जमशेटजीने रक्कम कृष्णरावांच्या हातात दिली. आणि सुमारे दीडदोनच्या सुमाराला आम्ही बिऱ्हाडी परतलो.
बहोत अच्छा, अभी सब कुछ ठीक है।
दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता आम्ही अचेम्व्ही स्टुडियोत गेलो. आपल्या आवाजाला `टू स्लो` म्हटल्याबद्दल कृष्णराव गोरे नितांत गोरेमोरे झाले होते. ट्रायलला त्यांनी सुदक्षिणापति दिलीपनंदन "हा रामराज्य वियोगातला सारंग ठणकावून गाताच साहेब खुष झाला आणि त्याने रेकॉर्डिंग चालू केले. दोन गाणी होताच गोरे विश्रांतीसाठी बाजूला सरले. चार वाजेपर्यंत हप्त्याहप्त्यांनी बारा गाण्यांचे कंत्राट पूर्ण झाले. बच्चू मास्तरने स्वतः कंपनीकडून ठरल्याप्रमाणे सर्व बिदागी वसूल करून आमच्या ताब्यात दिली, नि आमच्या स्वाऱ्या रात्रीच्या गाडीने अमरावतीला रवाना झाल्या. रचिला ज्याचा पाया त्याची संपादणि बरि झाली", या समाधानाने आम्ही मुक्कामी आलो हो गोऱ्यांना तीनशेच रुपये मिळणार होते ते सहाशे मिळाले.
माणसांसारखे गाणारे बोलणारे यंत्र
पहिल्या प्रथम तबकडीचे ग्रामोफोन यंत्र बाजारात आले. त्याकाळी त्याचे आबालवृद्धांना वाटणारे आश्चर्य, अचंबा नि कौतुक आजच्या रेडियोच्या युगात सांगणे कठीण आहे. त्यापूर्वीही एडिसनचा नळकांडी फोनोग्राफ कधीमधी एखाद्या यात्रेजत्रेत कोणीतरी घेऊन यायचा. त्याला पाचसहा रबरी नळ्या लावलेल्या दिडकीला एकएक गाणे ऐकणारांनी एकेक नळी कानाला लावायची नि ऐकायचे. शिवाय शिंगाडा लावला म्हणजे हॉलमध्ये बसून सगळ्यांना गाणे ऐकता येत असे. या फोनोग्राफात गाणे भरण्याची नि ऐकण्याची दुहेरी सोय होती. मी प्रथम हे यंत्र पनवेलला पाहिले. धूतपापेश्वरचे तात्या पुराणिक यांनी ते आणविले होते, आणि त्यात नवाथे मास्तरांची मेळ्याची पदे रेकॉर्ड केली होती.
त्याचा प्रयोग पनवेलच्या नेटिव जनरल लायब्ररीत केलेला मी प्रथमच ऐकला. त्यानंतर थोड्याच दिवसांनी खालापूरचे एक उद्योगी गृहस्थ नारायणराव बेन्द्रे हे पनवेलच्या उरुसाच्या हंगामात तेच सहा रबरी नळ्यांचे यंत्र घेऊन रोजगाराला आले. ते आमच्या घरीच आल्यामुळे करमल्लीशहाचा देवाळ्या तळ्याजवळच्या, तक्क्यावरच्या आणि हाजीमलंगच्या उरुसात नारायणरावांना दुकाने काढून देण्याची व्यवस्था वगैरे वडलांनीच करून दिली होती. त्यानंतर आला तबकडीचा ग्रामोफोन, त्याचा तो विशाल जबड्याचा शिंगाडा आणि त्या सुया! मुंबईच्या काळबादेवी रोडवर चारपाच दुकानांत ती यंत्रे विकायला ठेवलेली असत. आणि गिऱ्हाइकांचे लक्ष वेधण्यासाठी, तेथे लावल्या जाणाऱ्या गोहरजान, मलकाजान, प्यारासाहेब इत्यादींची गाणी ऐकण्यासाठी दुकानासमोर लोकांची झुंबड उडायची. त्याकाळचा तो लोकोत्तर चमत्कारच होता म्हणाना.
मी ग्रामोफोनचा भटक्या प्रदर्शक बनलो
स्वदेशी चळवळ, पत्रकारांची धरपकड, लोकांतल्या असंतोषाचा पारा वर चढलेला, अशा हंगामातली ही, सांगायला विसरलेली. घटना आहे. दोनतीन नाटक कंपन्यांबरोबर राहिल्यावर मी परत मुंबईला आलो. मी लिहिलेले `सीताशुद्धि` हे पौराणिक संगीत नाटक एका प्रकाशक संस्थेने विकत घेतले. त्याचे तीनशेपन्नास रुपये मला रोख दिले. विचार केला. ही रक्कम अशीच घरी नेली तर खाऊन फस्त होईल आणि आता काही महिने हातपाय हालवायला नको म्हणून मीही आयद्यासारखा घरी बसून राहीन. ते बरे नव्हे. या रकमेवर काही थोडा स्वतंत्र उद्योग करता आला तर पहावा. आधी माझ्यासारख्या अखंड धडपड्याच्या हातात उद्योगासाठी थोडेसे का होईना, पण भांडवल येणार कुठून? आता आले आहे. तर ते वाऱ्यावर उधळून, म्हणजे केवळ सुखेनैव जगण्यासाठी खर्च करणे बरे नव्हे.
माझे लक्ष ग्रामोफोनकडे वळले. अजून त्याचा सगळीकडे काही प्रसार झालेला नव्हता. शेकडो ठिकाणी लोकांना ते माहीतही नसावे. आपण ते विकत घेतले नि गावोगाव नारायणराव बेंद्रेंप्रणाणे फिरलो तर चांगली किफायत होईल, अशा हेतूने एक चांगला ग्रामोफोन आणि चार डझन तबकड्या मी खरेदी केल्या आणि पनवेलला परतलो. तेथे खुद गावातच चारपाच वकिलांच्या घरी त्याच्या जलसाचे प्रयोग होऊन पटकन दहापंधरा रुपये प्राप्ती झाली. लगेच पेन्शनर विनायकराव काकाना बरोबर घेऊन, आमच्या स्वाऱ्या बाहेर पडल्या हॅण्डबिले छापून घेतली. माणसांसारखे गाणारे, बोलणारे खदखदा हसणारे अद्भूत यंत्र, पहाल ऐकाल तर आश्चर्याने चकित इत्यादी नि वगैरे ठळक मथळ्याची हॅण्डबिले गावभर वाटायची. कोणा ना कोणाचे आमंत्रण यायचे.
पाच रुपये फी जमा करणारे लोक आपापसात वर्गणी जमवून आमची भर करायचे लग्नसराईत तर मेजवानीच्या पंगती बसल्या का त्यांची करमणूक करण्याचे हे आधुनिक साधन आम्हाला चांगलीच पैदास करून द्यायचे. ही आमची भटकंती बहुतेक रेल्वेने व्हायची, स्टेशनमास्तरची ओळख गाडीतून उतरताच व्हायची. तो आम्हाला बिऱ्हाडी न्यायचा नि सरबराई ठेवायचा. कारण, असले विचित्र यंत्र आपल्याकडे आलेले आहे. याचाच त्याला अभिमान वाटायचा. तो मग गावातली गिऱ्हाइके मिळवायचा, स्टेशनवर वर्गणी जमवून प्रयोग करायचा आणि विशेष म्हणजे गार्डसाहेबांना आमची ओळख करून देऊन पुढच्या मुक्कामाचा प्रवास मोफत करण्याची सोय करून द्यायचा. अशा रीतीने मी सोलापूर, बार्शी पंढरपूरपर्यंत खूप भटकलो. प्राप्तीही बरी झाली ओळखी सपाटून झाल्या वाटेत परिचित नाटक मंडळीची गाठ पडल्यावर मग हो काय? घरच आमचे ते तेथे आडवारी थेटरातही ४-२-१ आणा तिकिटे लावून जाहीर प्रयोग केले खर्च कसला? कंपनी आमचीच!
जळगावचे नाना फडणीस
या सर्व घटना १९०६-०७ सालच्या. थोडे दिवस विश्रांतीसाठी पनवेलला येऊन, मी ग्रामोफोन घेऊन खानदेश जिंकायला निघालो. जळगावला धाकटा बंधू यशवंतराव पीडब्ल्यूडी मध्ये नोकरीला होता. जळगावला येताच तेथे प्रथम परिचय झाला तो के. नारायण नरसिंह फडणीस या रसिकवर्याचा, नाना वयातीत असलेतरी त्याची उद्योगाची कडी चढती होती मराठी कवी, कविता यांना सक्रीय उत्तेजन देण्यासाठी त्यांनी काव्यरत्नावली नावाचे मासिक कितीतरी वर्षे नेटाने चालविलेले होते. शिवाय त्यांचे प्रबोधचंद्रिका` हे साप्ताहिकही चालू होतेच त्यांचा बाबजी प्रिंटिंग प्रेस खिळा नि शिळा छापाचा असा दुहेरी होता. नाना स्वतः जातिवंत कवी होतेच, पण अनेक नामांकित कविवर्याच्या काव्यांना मुद्रित करून त्यानी त्याना चिरंजीव केलेले आहे. काव्यरत्नावली नसती तर आज बहुतेक मराठी कवी नामशेष तरी उरले असते की नाही, कोण जाणे. पण त्या मासिकाला लोकांकडून काहीही आश्रय मिळत नसे कोणी रसिक आले भेटीला, तर नाना काव्यरत्नावलीची बांधीव वार्षिक पुस्तके त्यांना आग्रह करून भेट द्यायचे.
थोडयाच दिवसांत नानांचा नि माझा स्नेह इतका जमला की सकाळचा चहा उरकला का माझी बैठक नानांच्या घरी. मग काव्यशास्त्रविनोदाचा तेथे पाऊस पडायचा. नानांचा एक लहानगा मुलगा काही दिवसांपूर्वी वारला होता. त्या प्रसंगावर नानांनी स्मशानात एक सहजस्फूर्त कविता मोठ्या उमाळ्यानं म्हटली होती. ती एकदा त्यांनी मला म्हणून दाखविताना, तो शोकप्रसंग मूर्तिमंत डोळ्यांसमोर उभा केला. ती कविता (आज आठवते तेवढी) अशी
या क्रूर माझिया हाती । लोटितो तुझ्यावर माती ।
दगडाचि करूनिया छाती । शिशुवरा ।।
जळगाव माझ्या पत्रव्यवहाराची जन्मभूमी
"आसपासच्या शहरी गावांत ग्रामोफोनचे धावते प्रयोग करीत होतोच. जळगावला माझा मुक्काम सरासरी सहासात महिने तरी होता. या अवधीत नाना फडणिसांच्या सक्रीय उत्तेजनाने मी तेथे सारथी` नावाचे मासिक चालू केले. माझ्या पत्र व्यवसायाचा हा श्रीगणेशा नानांनीच हात धरून काढविलेला आहे. चारपाच अंक तेथे काढल्यावर मी मुंबईला आलो. तेथे ते पुढे वर्षभर चालू ठेवले. त्याच अवधीत अमळनेरचे देशकालवर्तमान नावाचे ज्योतिषविषयक साप्ताहिक चालविणारे शास्त्रीबुवा माझ्या परिचयाच्या कक्षेत आले. त्यांचा ज्योतिष्यांचा व्यवसाय तर होताच. शिवाय तंत्रमंत्रादी भानगडीही जवळ असत. मी मुंबईला आल्यावर थोड्याच दिवसात गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क (मागाहून लॉर्ड सिडेहॅम्) यांनी गवा लशीचा प्रचार करण्यासाठी मुंबई इलाख्यातल्या पत्रकारांची जी बैठक बोलावली होती, तिचा फायदा घेऊन शास्त्रीबुवा मुंबईला माझ्या बिऱ्हाडी उतरले होते. गव्हर्नरसाहेबांच्या खास आमंत्रणावरून आलेले अमळनेरचे प्रख्यात ज्योतिषी अशा मथळ्याचे हस्तपत्रके मुंबईभर वाटल्यामुळे, स्वारीला ज्योतिष तंत्रमंत्र, होमहवनाची बरीच आमंत्रणे आली नि पैदासही चांगली झाली. अर्थात प्लेग-लस परिषदेचा एक दिवसाचा. कार्यक्रम उरकल्यानंतर शास्त्रीबुवा तब्बल पंधरवडा मुंबईतच छावणी ठोकून होते.
जळगावचा आणि माझ्या पत्रव्यवसायाचा ऋणानुबंध काही विलक्षण दिसतो. अगदी अलिकडे तेथील बातमीदार साप्ताहिकात तब्बल नऊदहा वर्षे नियमित लेख पुरविण्याचा योगही मला लाभलेला आहे.
श्रीपाद केशव नाईक
जळगावहून परत मुंबईला आलो, त्यावेळीही स्वदेशी चळवळ आणि राजकीय खटल्यांचा धुमाकूळ सर्वत्र चालूच होता. मात्र यच्चयावत जनता, सारे भेदभाव विसरून एकदिल होती. व्याख्याने प्रवचने, पुराणे शिवजन्मोत्सव, दसऱ्याच्या मिरवणुकी वगैरे नित्यनैमित्तिक लोकजागृतीचे खटाटोप चालूच होते. त्याकाळी गिरगावातल्या विद्यार्थीमंडळात नैतिक शिक्षणाचा प्रसार नि प्रचार करणारा हिंमती नि उत्साही तरुण म्हणजे श्रीपाद केशव नाईक. त्याची सगळी कामे मुकाटतोंडी चालायची. रस्त्याने जात असला तर दर पावलाला तो कोणाला ना कोणाला तरी नमस्कार करून थांबवायचा, काही बोलायचा नि पुढचे पाऊल उचलायचा. डॉ. भांडारकर काय, डॉ भाटवडेकर काय किंवा जस्टिस चंदावरकर काय, त्यांच्याही गाड्या तो थांबवायचा. त्याचा एकच उद्योग, दर महिन्याला एक पाठपोठ हस्तपत्रिका छापायची आणि तिच्या हजारो प्रती प्रत्येक शाळेत जाऊन स्वतः विद्यार्थ्यांना वाटायच्या. त्यात ज्ञानेश्वरादी संतांची वचने किंवा पौर्वात्य पाश्चिमात्य तत्त्ववेत्त्यांचे (भाषांतरित) सुविचार असायचे.
माझी त्याची जानी दोस्ती होती आणि ती त्याच्या मृत्युक्षणापर्यंत टिकली. पाहिले तर हा माणूस फाटक्या खिशाचा, वणवण भटकायचा नि चहाच्या कपालाही महाग. पण सारखा काही ना काही कार्य करीतच असायचा. त्याने आर्यन एक्सेलशिअर लीग नावाची संस्था स्थापन केली होती. तिच्या विद्यमाने त्याचे हे प्रचारकार्य चालायचे. एक दिवस मी त्याला विचारले, "काय रे नायका, दर महिन्याला एकेक हॅण्डबिल तू छापतोस तरी कसा? पैसा कुठून आणतोस?" तो हसत हसत म्हणाला, "पैसा कशाला हवा? या गिरगावात चांगले पंधरावीस धनत्तर छापखाने आहेत. त्यांचा धंदाही जोरात आहे. प्रत्येक वर्षातून एकदा एक हॅण्डबिल फुकटात छापून द्यावे, अशी केली खटपट. देतात ते. मी वाटतो." मला वाटते, त्यावेळी तो आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या आंग्रेवाडीतल्या शाळेत शिक्षकाचे काम करीत असे.
कोणीही विलायतचा थोरमोठा गोरा मुत्सद्दी, गव्हर्नर येवो, नाईक आपल्या आर्यन एक्सेलशिअर लीगचा प्रतिनिधी म्हणून हार घेऊन त्याचे स्वागत करायला अपोलो बंदरावर बिनचूक हजर, त्यात कोणी तत्त्ववेत्ता प्रचारक असला तर त्याची व्याख्याने करविण्याची व्यवस्थाही तो करायचा. प्रार्थना समाजात स्टूडंट्स ब्रदरहुडतर्फे चंदावरकर भांडरकरादी तत्त्ववेत्यांची दर रविवारी सकाळी विद्यार्थ्यांसाठी भाषणे व्हायची. त्यांचीही व्यवस्था पहायला नाईक खडा उभा. विद्यार्थ्यांच्या उमलत्या पिढीत स्वदेश, स्वधर्म आणि नीतिमत्ता यांचा भरपूर प्रचार, हा नाईकाच्या जीवनाचा एक जबरदस्त ध्यास. पिठोरी अमावास्येच्या दिवशी मातृदिन साजरा करण्याच्या योजनेचा मूळ उत्पादक नि आमरण पुरस्कर्ता श्रीपाद केशव नाईक. पहिला उत्सव त्याने सर्व शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा मेळावा प्रार्थना समाजाच्या हॉलमध्ये भरवून साजरा केला, नंतर आजकाल तो सर्वत्र होतच असतो. पण त्या योजनेचा पिता नाईक हे उत्सवकर्त्यांना ठावे आहे का नाही. देव जाणे.
त्या दिवशी मुलांना मिठाई वाटण्यात येत असे. त्याच्या खर्चासाठी तो निवडक लहानमोठ्या माणसांच्या घरी जाऊन देणग्या मिळवायचा. अलिकडे बरीच वर्षे तो दादरलाच रहात असे. माणूस अगदी गबाळ्या, ते मळकट धोतर, ती त्रेतायुगातील टोपी नि एक जुना लांब कोट, कधी बदलल्याचे पाहिले नाही. उदरभरणासाठी काय उद्योग करायचा, त्याचा थांगपत्ता नसायचा. पण जेव्हा पहाल तेव्हा हसतमुख, विनोदी नि उत्साही निराशेची सुरकुतीही चेहऱ्यावर कधी नसायची. मुंबईतील जुन्या पिढीतल्या शंभरावर नामांकित थोर पुढाऱ्यांची त्रोटक चरित्रे त्याने श्री. अनंतराव गद्रे यांच्या `निर्भिड` मध्ये छापली होती. इतर सटरफटर धनाढ्यांच्या जयंत्यामयंत्या साजऱ्या होतात. पण नाईकासारख्या अबोल लोकसेवकाची आठवण कोण करणार? मी करतो.
छत्रे मास्तर
गिरगावातल्या पारशी अग्यारीसमोर एक छोटेखानी बैठा बंगला होता. तेथे छत्रे मास्तर रहात असत. देहाने फुटबॉल. कोणत्या तरी मिशनरी शाळेत मास्तर होते. पण माणूस जातिवंत स्वदेशाभिमानी. टिळक पक्षाचा. सगळीकडे खटपटींचा व्याप आणि कोठेच कशात नाही, अशा वृत्तीचा परिचय झाल्याशिवाय कर्तबगारीचा थांग लागायचा नाही. भलत्या सलत्याला दाराशी उभा करायचा नाही. गोरगरिबांच्या अडचणी मुकाटतोंडी दूर करायचा. उत्साही वक्ते, प्रचारक, उत्सव योजकांना हस्ते परहस्ते मदत करून कार्य करून घ्यायचा. माझा नि छत्रे मास्तरांचा परिचय बँकबेवरील माझ्या एका जाहीर व्याख्यानाने झाला. व्याख्यान आटोपताच स्वारी माझ्याजवळ आली. विचारपूस केली नि बिऱ्हाडी मला घेऊन गेली. लो. टिळक रायगडला शिवजयंती उत्सवासाठी गेले, तेव्हा गिरगावातले सारे चळवळीचे पुढारीही गेले होते. गिरगावात उत्सव कोणी करायचा? मोठा अडचणीचा प्रश्न. त्यावेळी छत्रे मास्तरांनी खटपट करून शांतारामच्या चाळीत उत्सवाची योजना केली. जाहिराती फडकावल्या नि उत्सव साजरा केला. याकामी सतत तीन दिवस त्यांनी मला बरोबर कामाला राबविले. अशी अबोल कर्तबगार माणसे होती त्याकाळी म्हणून आंदोलने यशस्वी नि परिणामकारक होत असत.
ग्रामोफोन यात्रा पुन्हा चालू
सरकारचा वृत्तपत्रे नि छापखान्यावरचा दण्डुका विशेष जोरदार भडकल्यामुळे, जहाल भाषेतली पत्रे छापायला छापखाने धजत नसत. म्हणून सारथी मासिकाचा व्याप बंद करून मी पुन्हा ग्रामोफोनच्या फिरतीवर निघालो. ती माझी कामधेनू, आम्ही चळवळीच्या धिबिडग्यात खूप रंगलो, पण पनवेलची घरची पोटापाण्याची मासिक हाक थोडीच चुकणार? फिरतीवर दोनतीन महिने कमाई करून, तेथली गरज भागविल्यावर मी पुण्याला आलो. काळ सन १९०६-७ सालचा ही माझी पुण्याची भेट दुसरी त्यापूर्वी सन १९०३ साली दोन-तीन महिने विद्यार्थी म्हणून रावसाहेब समर्थांकडे होतो. बस्स. या पलीकडे पुण्याचा नि माझा संबंध १९२५ सालापर्यंत कधी आलाच नाही. दुसऱ्यांदा आलो तो महाराष्ट्र नाटक मंडळीत २-३ महिन्यांचा मुक्काम, केशवराव दाते, मामा भट आणि मी फुटक्या बुरजाजवळच्या राजे परांजपे यांच्या इमारतीत (मंडळीची छावणी होती तेथे) एकाच खोलीत रहात होतो. कंपनीच्या सवाई माधवराव नाटकात शाहिराची भूमिका मी केलेली आहे. येथे असतानाही ग्रामोफोनची आमंत्रणे आणि फोटो एग्लार्जिंगची कामे घेत असे. कर्जतनजीकच्या वेणगाव येथील विसुभाऊ वैद्य यांच्या वडिलांच्या एका जुनाट फिकट टीचभर फोटोवरून मी करून दिलेले एन्लार्जमेंटचे चित्र आजही वेणगाव येथे वैद्यांच्या घराच्या प्रवेशदारावर टांगलेले आहे.
पुन्हा नाटक मंडळीत!
उद्योगाची, रोजगाराची समोर येईल ती संधी गमवायची नाही, मग तो व्यवसाय कोणता का असेना, आपल्या मगदुरीच्या मर्यादेत आहे, आपण तो कशोशीने नि इभ्रतीने पार पाडू इतक्या आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाकायचे, ही माझी प्रवृत्ती. असाच एक योग पुण्याला महाराष्ट्र मंडळीत असताना आला. ललितकलादर्श नाटक मंडळीचे गणपतराव वीरकर सहज एकदा रस्त्यात भेटले आणि त्यांनी मला कंपनीत येण्याचा आग्रह केला. त्यावेळी कंपनी हुबळीला नुकतीच स्थापन झाली होती. दुसरी छावणी कोल्हापुरची. मी तेथेच सामील झालो. कोल्हापुराचा नि माझा प्रथम संबंध आला तो या निमित्ताने. या मुक्कामात अनेक स्थानिक गृहस्थांचा नि कुटुंबांचा ऋणानुबंध जमला, तो आजदिनतागायत चिरंजीव आहे. कोल्हापुराहून अथणी, सांगली, मिरज, निपाणी एवढे मुक्काम झाल्यावर अचानक एक दिवस बोरगावचे दादासाहेब चिटणीस हे वृद्ध गृहस्थ मला भेटायला निपाणीला आले. खाटीक गल्लीत त्याचा एक लहानसा छापखाना होता, त्यांना स्वतः त्या धंद्याकडे पहाण्याइतका उजगर नव्हता. तो मी चालवायला घ्यावा, असा त्यांनी आग्रह केला.
छापखान्याची शाई एकदा बोटांना लागली का तो माणूस चिकटलाच कायमचा त्या धंद्याला, असे म्हणतात आणि सर्वत्र अनुभव तोच आहे. माझी बोटे आधीच त्या शाईने पुनित केलेली असल्यामुळे, चिटणिसांच्या अयाचित आग्रहाचा मी तात्काळ स्वीकार केला. राजकारणाप्रमाणे नाटक व्यवसायातही पक्षबाजी नि पॉलिटिक्स असतेच. त्या पॉलिटिक्समुळेच नाटक मंडळ्यांतल्या फाटाफुटी नि नवीन मंडळ्यांची पैदास होत असे. केशवराव भोसल्यांना स्वदेशहितचितकातल्या पॉलिटिक्समुळेच ती कंपनी सोडावी लागली होती. निपाणीच्या मुक्कामात हे तमाशे बरेच आच धरू लागत असल्यामुळे मी तेथून निसटण्याचा विचार करीत होतो. इतक्यात ती छापखान्याची संधी आयतीच पायाशी आली. मी लागलीच कोल्हापूरला प्रयाण केले.
पण उतरणार कोठे?
टांग्यात बसून मी कोल्हापूरला जायला निघालो खरा. पण तेथे बाडबिस्तरासह उतरणार कुठे? हा प्रश्न सारखा चालला होता डोक्यात. माझ्याच बरोबर काका तारदाळकर नावाचे एक मध्यमवयीन गृहस्थ होते. दोनच दिवसांपूर्वी ते आपला भाचा बेडेकर यांना भेटायला कंपनीत आले होते. बेडेकर म्हणजे ललितकलादर्शचे सूत्रधार प्रत्येक नाटकात त्यांना सूत्रधाराची भूमिका हमखास देत असत. पहाडी झारदार आवाज. त्यामुळे नाटकाच्या पुढील रंगाचा उठाव ते फार छान करीत असत. काका सूत्रधाराचे मामा, एवढेच मला माहीत होते. त्यापेक्षा फारसा परिचय झालेला नव्हता. प्रवासात कागल गेल्यावर त्यांनी मला सहज विचारले, "कोल्हापुरात कुठे उतरणार तुम्ही."
मी उत्तर दिले, "तीच तर पंचाईत आहे."
वेळ सायंकाळची टांगा कोल्हापुरात शिरला. उपाध्ये बोळात घेऊन चल. असे काकांनी टांगेवाल्याला सांगितले, त्या ठिकाणी उतरल्यावर आपण छापखान्याचा पत्ता काढीत जावे, मग जमेल तसे जमवून घ्यावे, असे विचार मनात घोळत असतानाच, टांगा उपाध्ये बोळात काकांच्या घराजवळ थांबला. त्यांचे पुतणे जवळ आले. "चला रे, काढा सारे सामान बाहेर नि चला घेऊन आत." काकांचा हुकूम सुटला.
मलाही ते म्हणाले, "चला. उतरा. निमूटपणे मी त्यांच्याबरोबर आत गेलो. मुलांनी सारे सामान माडीवर नेले. मी कपडे काढले आणि हातपाय तोंड धुऊन ओटीवरच्या बैठकीवर बसलो. इतक्यात चहा आला. अगदी ठाशीव शब्दांत काका म्हणाले, "हे घर तुमचे, आता इथेच रहायचंय तुम्हाला समजले? कसलाही संकोच बाळगायचा नाही." माझ्या वसतीची व्यवस्था त्यांनी माडीवर स्वतंत्र लावली. बोलणे चालणे कसलेच काही नसताना, हा ब्राह्मण गृहस्थ अचानक माझी अशी बडदास्त का ठेवतो, काही उमजेना. तासभरात जेवण्याची वेळ आली. काकांनी हाक मारली नि मी माजघरात गेलो. दोनतीन लहान मुलगे आणि शेवटल्या पाटावर काका बसले होते. त्यांनी मला मधल्या रिकाम्या पाटावर बसायला खूण केली. मी जरा थबकलोच.
म्हटले, काकांना माझी जातपात ठावी आहे का नाही, कोण जाणे? माझ्या तोंडून `पण काका...` हे शब्द पडले असतील नसतील, तोच काका निर्धाराच्या आवाजात म्हणाले, "आमच्या इथं जातपात काही नाही बरं, लक्षात ठेवा. तुम्ही सबनीस जातीचे, हे मला माहीत आहे. चला मुकाट्याने बसा पाटावर." भोजन झाल्यावर वाटले, आपल्याला खरकटे तरी काढावे लागणार. पण कसचे काय नि कसचे काय. हात धुताच काकांचा हुकूम सुटला, हं, चला माडीवर. इथं आता काही काम नाही. त्यांनी जवळजवळ मला हुसकावीतच नेले बरोबर म्हणाना. मुखशुद्धीसाठी आणलेली मक्याची भाजलेली कणसे खात असताना काका त्यांच्या निग्रही आवाजात म्हणाले, "हे तुमचे बिऱ्हाड, इथून हालायचं नाही. संकोच बाळगायचा नाही. घर तुमचे आहे. काय लागेल सवरेल ते मागून घ्यायचे. समजलं? पुन्हा सांगणार नाही."
दुसऱ्या दिवशी सकाळी छापखान्याच्या कामाचा चार्ज घेण्यासाठी जाताना काका बरोबर `आले. निदान दोन महिने तरी मी तारदाळकर काकांच्या बिऱ्हाडी अगदी त्यांच्या घरातलाच एक, अशा मोकळेपणानं रहात होतो. ते भोजनखर्चही घेत ना. काय करावे, समजेना. दोनचार दिवसांनी एक दिवस काकांनी आणलेली एक नवी कोरी पायपेटी मला दाखवली. म्हणाले हा आमचा पुतण्या. शाळाशिक्षण झाले आकटो विकटो. म्हटलं पेटी वाजवायला तरी शीक. त्यातही अळमटळम्. तुम्ही याला पेटीवादनाचे धडे नियमित देत जा. माझ्यापाशी ग्रामोफोन होताच त्यावरून निरनिराळ्या रागांच्या स्वरांच्या अनुकरणाने मी त्याला रोज तास दोन तास शिकवायला लागलो. त्यालाही गोडी लागली आणि थोडयाच दिवसांत तो चलाखीने हात चालवू लागला. हाच तारदाळकर पुढे ललितकलादर्शमध्ये मुख्य पेटीवाला म्हणून नावालौकिकाला आला.
काही दिवसांनी मी गंगावेशीजवळ पाटलांच्या माडीवर स्वतंत्रपणे रहायला गेलो. खानवळीत जेवण. काकांची फेरी रोज चौकशी करायला चुकली नाही. अशी जिव्हाळ्याची नि मोकळ्या मनाची माणसे चालू जमान्यात बेपत्ता. उलट प्रसंगोपात पंगतीला बसण्याचा षटीसामासी योग आला. तर उपकाराच्या सबबीवर त्या जेवणाचे उष्टे दिमाखाने चव्हाट्यावर चघळणारे कुत्रेच अलिकडे फार.
बादशहा अवलियाचा स्नेह संपर्क
लहानसा का असेना, पण छापखाना आहे. बस्स एवढ्याच मुद्यावर मी तो व्यवसाय हाती घेतला. सुदैवाने फोरमन दौलती मोठा इमानी नि हिंमती असा लाभला. त्यामुळे छपाईची कामे आणणे, छापणे, बिले वसूल करणे इत्यादी तो जातीने पहात असल्यामुळे, लेखन आणि तेली रंगातील पोर्ट्रेट पेंटिंगची कामे करायला मला भरपूर वेळ मिळायचा. छापखान्याच्या माडीवर बादशहा नावाचे एक तरुण ब्रह्मचारी मुसलमान अवलिया यांची बैठक असे. माणूस मोठा दिलदार, जितका रगेल तितकाच रंगेल. अनेक लोक त्यांच्याकडे आशिर्वादासाठी यायचे. त्यांचा थोरला भाऊ शेजारीच मालकीच्या घरात आयुर्वेदीय नि युनानी हकीम म्हणून व्यवसाय करीत होते.
मोठे कुटुंब. बादशहाला बाराच्या सुमाराला घरून वाढून यायचे आणि तो दिवसातून फक्त एकदाच जेवायचा. जेव्हा पहावे तेव्हा तो चिंतनमग्न असायचा. मात्र कोणी आले का रसाळ जिव्हाळ्याच्या वक्तव्याचा हलकाफूल वर्षाव करायचा. सदा हसतमुख. बादशहाचा नि माझा लवकरच स्नेह जमला. व्यावहारिक, सांसारिक काही अडचणी आल्या नि बादशहाच्या कानावर घातल्या म्हणजे प्रथम तो खदखदा हसायचा नि मग त्यावर बिनतोड तोडगा सुचवून विलक्षण धीर द्यायचा. "अहो, आहे काय त्यात एवढे? त्यांनी असा पेच मारला, तर आपण अगदी तस्साच नवा पेच मारून बसवायचा त्याला गप्प. संसार ही एक लढाई आहे. माणसाला व्यवहारातले पाचपेच अगदी तोंडपाठ पाहिजेत, आपण सरळ नीतिमत्तेने वागावे. म्हणजे कोणाचे काही चालणार नाही. अहो, माशी कुठे बसते? अंगावर बारीकशी जखम असेल तेव्हाच ना? अनीतीची जखमच आपण होऊ दिली नाही, तर निंदकाच्या माशा येतील कशाला आपल्याजवळ घोंग घोंग करायला?" अशा पद्धतीचा त्याचा उपदेश असायचा. बादशहाच्या निकट सान्निध्याने माझे कोल्हापूरचे वास्तव्य सर्वतोपरी आनंदात उत्साहात ढवळून निघत असे,
कोल्हापूर सोडल्यानंतर काही वर्षांनी मी त्यांना गावाबाहेर दूरवर अशा एका एकांत घळीत ते रहात असताना भेटायला गेलो होतो. त्यानंतर अलिकडे काही वर्षांपूर्वी बिंदुचौकात माझे जाहीर व्याख्यान होते. त्यावेळी त्यांनी आपल्या पुतण्यांना मुद्दाम सभेच्या ठिकाणी पाठवून मला घरी नेण्याची अगत्याची व्यवस्था केली. मी भेटलो त्यावेळी ते आपल्या घरी आजारी होते. उपचार चालू होते. बिछान्यात पडून रहाण्याची वैद्यकीय आज्ञा होती. पण मला पहाताच बादशाह उमाळ्याने ताडकन उठून उभे राहिले नि मला पोटाशी कवटाळले, "केशवराव, आज मला फार आनंद झाला, परमानंद झाला. तुम्ही भेटलात.... मी आता मार्गाला लागलोय....शाश्वती नाही....शेवटल्या भेटीचा आनंद... बसा."
ते उठून उभे राहिल्यामुळे त्यांना सावरायला त्यांचे बंधू नि पुतणे धावले. आणि काय चमत्कार पहा. फार बोलू नका, असा भावाचा आग्रह होत असतानाही, बादशाह इतक्या अवसानाने बोलू लागले की मला छापखान्याच्या वेळच्या त्यांच्या हिरिरीची आठवण झाली. "अरे बाबांनो, आम्ही आता भरपूर बोलून घ्यायचे नाही तर केव्हा रे? अशी माणसे काय वरचेवर भेटतात? आणि... केशवराव, अखेरीला भेटलात... बस. भक्ती, श्रद्धा मोठे भांडवल... आज दोघांना त्यांचे भरपूर व्याज मिळाले. नंतर चहा मागवला दोन कप. मला दिला नि स्वतः पिऊ लागले. एक पुतण्या म्हणाला, "च्याच्याजी, आपण चहा घ्यायचा नाही." बादशहा एकदम मोठ्याने खदखदा हसले नि म्हणाले, "अरे बच्चा. तुला काय माहीत. छापखान्यात स्टोववर यांनी चहा केला का माझा जादा एक कप ठरलेला. आज तो मी सोडीन काय?" मी बादशहांच्या पायांवर मस्तक घासून त्यांचा निरोप घेतला. पुढे थोड्याच दिवसांत बादशहा पैगंबरवासी झाल्याचे वृत्त वर्तमान पत्रात वाचले.
चित्र-शिल्पकार आनंदराव
बाबुराव पेण्टर ज्याला गुरू मानीत असत, ते आनंदराव पेण्टर यांचा माझा स्नेह ललितकलादर्शमध्ये जमला. त्यावेळी ते अगदी तरुण होते. सदानकदा हसतमुख. कंपनी सोडल्यावर ते कोल्हापूरला असताना, वरचेवर छापखान्यात यायचे. मी तयार करीत असलेली पोर्ट्रेट पेंटिंगची कामे पहायचे, सूचना द्यायचे किंवा स्वतःच कलम नि रंग घेऊन त्यात सुधारणा करायचे. या कलेच्या व्यवसायात मला आनंदरावांच्या अनेक सूचना मार्गदर्शक झाल्या.
सापडलो पुन्हा नाटक मंडळींच्या चक्रव्यूहात
कोल्हापुरातला छापखान्याचा व्यवसाय जेमतेम पोटापुरते देई, मागणे लइ नाही, लइ नाही, अशा थाटाचा होता. कोठेतरी काहीतरी धडपड करून, पनवेलच्या कुटुंबाच्या संरक्षण-पोषणाची यातायात करायची. व्यवसायाचा निश्चित मार्ग अजून ठरलेला नव्हता. समोर येईल त्या संधीवर स्वार होऊन भविष्यातील अंधारात स्थायी जीवनाचा ध्रुवतारा शोधणारा धडपड्या मी.
अशा माणसाच्या जीवनात अनेक आकर्षक योग हमखास येत असतात. प्रत्येक योग स्थायी जीवन ठरविण्याइतपत मोहक नि आकर्षक दिसतो. महत्त्वाकांक्षी माणूस दिव्यावर झाप टाकणाऱ्या पतंगासारखा त्या योगावर झाप टाकतो. पूर्वीची काहीही ओळखदेख नसताना, अचानक एक दिवस `स्वदेशहितचिंतक` चे जनुभाऊ निंबकर, गंगावेशीत पाटलांच्या माडीवर मी रहात होतो तेथे, जणू माझेच पाहुणे नात्याने येऊन दाखल झाले. खानवळीत जेवून छापखान्याचा व्यवसाय करणारा सडेसोट मी. या पाहुण्याची बडदास्त राखावी कशी? मोठा प्रश्न पडला माझ्यापुढे पाहिले तर पाहुण्याचा स्नानसंध्येचा नि उपरण्यात माळ घेऊन डोळे मिटून जपजाप्याचा थाट काही और!
हे आले कशाला? नि माझ्याकडे? त्यावेळी गोपाळराव काशीकर आणि त्यांचा नऊदहा वर्षांचा नट-मुलगा किशा नुकतेच ललितकलादर्श सोडून घरी बसले होते. जनुभाऊंना किशा काशीकराला स्वदेशहितचितकात न्यायचे होते. या खटपटीचे नाट्यकरण थोड्याच वेळात माझ्या माडीवर चालू झाले. बैठकीवर बैठकी, मध्यस्थांचे मतभेद आणि शिफारशी, काशीकर कुटुंबातील मंडळीच्या अटी. अनेक भानगडींची एक काँग्रेसच दिवसरात्र चालू राहिली. अखेर, कंपनीच्या भागीदारी मधाच्या बोट-चाटणीवर गोपाळराव नि किशाने खामगावच्या मुक्कामावर जाण्यासाठी मान्यता दिली. या अवधीत जनुभाऊंनी "आपलीही आम्हाला निकडीची जरूर आहे" अशा मोहाचे जाळे माझ्यावरही टाकून, पार्सलबरोबर लेबलाच्या थाटाने, माझीही मोट बांधली. आणि फार तपशिलांच्या भानगडीत न पडता. मीही पतंगासारखा पुन्हा नाटक मंडळीच्या आकर्षक दिव्यावर झाप टाकली. रंडीबाज राजकारणाप्रमाणे मोहिनीबाज नाट्यकारणाचा कडवट अनुभव जमेला असताही. एखाद्या हिप्नटाइज्डाप्रमाणे जनुभाऊंनी, केवळ आपला किशा प्राप्तीचा हेतू साधण्यासाठी. मला आपल्या पचनी पाडला.
तात्यासाहेब कोल्हटकरांची स्नेह-प्राप्ती
खामगावला पाऊल टाकताच अगदी दुसऱ्या दिवशी "कुठं आहेत आमचे वकीलसाहेब?" असा शोध करीत, तात्यासाहेब कंपनीत मला भेटायला आले. या वकिलीची कथा अशी मध्यंतरी ग्रामोफोनी दौरा स्थगित करून दीडदोन महिने पुण्याला महाराष्ट्र मंडळीत छावणीला असल्याची हकिकत मागे सांगितलीच आहे. त्या अवधीत, शंकरराव मुजुमदारांचा नि माझा चांगलाच परिचय झालेला होता. त्याच वेळी किर्लोस्कर करीत असलेल्या कोल्हटकरांच्या `गुप्तमंजुष नाटकावर ठोसर मराठेकृत नाट्यकलारुक्कुठार` नावाचे उपरोधगर्भ विनोदी टीकेचे एक पुस्तक बाहेर पडले आणि त्याची एक प्रत मुजुमदार चालवीत असलेल्या रंगभूमी` मासिकाकडे अभिप्रायाला आली होती. रुक्कुठाराने गुप्तमंजुषाविषयी लोकांत चांगलीच खळबळ उडवून दिली होती. तशात ते किर्लोस्कर कंपनीच्या रंगभूमी मासिकाकडेच अभिप्रायाला आलेले.
अभिप्राय न द्यावा तरी पंचाईत, द्यावा तर तो कसा द्यावा नि कोणी द्यावा, यावर महाराष्ट्र मंडळीच्या छावणीत रोज सकाळी जमणाऱ्या केळकर खाडिलकर-मुजुमदार भानू प्रभुतींच्या बैठकीत खल चालायचा. संभावित दादोबा पांडुरंगी भाषेचा अभिप्राय देऊन, रुक्कुठाराने दाखविलेले नाटकाचे ठळक दोष नाकारण्यात यश येणार नाही. तशाच रोखठोक उपहासगर्भ पण मर्मभेदी पद्धतीने उत्तर दिल्यास जमण्यासारखे आहे, असा निर्णय घेण्यात आला. पण हे काम करणार कोण? हा पुढचा सवाल. त्यावर कारखानीस आणि भागवत यांनी माझी शिफारस केली. रात्री मुजुमदारांनी मला घरी बोलावून घेतले नि आग्रहाने ते काम माझ्याकडे सोपविले. सातआठ दिवसांत "डोंगर पोखरून उंदीर काढला", ले. सुदर्शन या मथळ्याचे रुक्कुठारपरीक्षण मी लिहून दिले आणि ते रंगभूमीत छापूनही आले. या पुण्यातल्या घटनेला उद्देशूनच. तात्यासाहेब म्हणाले - "मी धंद्याने वकील तर खराच, पण या वकिलाचीही वकिली ठाकरे यांनी करून केस जिंकली, म्हणून मला त्या आमच्या वकिलाची भेट घेऊन थँक्स मानायचे आहेत."
खामगावाच्या मुक्कामात तात्यासाहेबांचा नि माझा स्नेह फारच दृढावला. त्यावेळी त्यांनी `मतीविकार नाटक लिहायला घेतले होते. तात्या स्वतः पटाईत संगीत-तंज्ञ. नवनव्या चालींच्या ते शोधात असायचे. चोरट्या आवाजात तर ते तान पलट मुरकी घेऊन इतके सुंदर गात असत की एक मैफलच साजरी व्हायची. उर्दू संगीत चालींचा त्यांना मोठा षोक माझ्याजवळ ग्रामोफोन होताच आणि स्वतः सतारीवर मी बऱ्याच रेकॉर्डस् ध्वनिशुद्ध वाजवीत असल्यामुळे, मतिविकारासाठी नव्या चाली घेण्यासाठी. तात्यांच्या फुरसतीच्या वेळी. बहुतेक दररोज सतार घेऊन मी तात्यांच्या बंगल्यावर बैठकीला जात असे. तात्यांचा नि माझा जानी दोस्तीचा घरोबा त्यांच्या मृत्युक्षणापर्यंत कायम कसा टिकला. त्याचा एकच दाखला देऊन पुढे जाणार आहे.
पण हे वारंट टाळणे अशक्य
सन १९२१ सालची गोष्ट. खांडके बिल्डिंग नं. ६ च्या माथा मजल्यावर स्वाध्यायाश्रम नावाची एक संस्था मी चालविलेली होती. तिचा वृत्तान्त पुढे येईलच. तेथे काही तरुण मंडळींनी `गोविंदाग्रज` मंडळ चालविले होते. श्री. मोरेश्वर बाळकृष्ण देशमुख, एम.ए. भार्गव कोर्लेकर, एस्. एस्. गुप्ते, कद्रेकर वगैरे दहाबारा तरुणांचा तो उद्योग होता. सन १९२१ साली गोविंदाग्रज स्मृतिदिन, दादर येथे जाहीर थाटामाटाने साजरा करण्याची त्यांनी योजना आखली. `प्रबोधन` पाक्षिक आणि इतरत्र प्रसिद्ध झालेल्या माझ्या निवडक लेखांचे स्वाध्याय-संदेश नावाचे एक दीडशे पानी पुसतक मंडळाने छापले प्रिं. गोविंदराव चिमणाजी भाटे यांची प्रस्तावना लिहिली. गडकऱ्यांच्या राजसंन्यास नाटकातील काही प्रवेश रंगभूमीवर प्रथमच आणण्याची तयारी केली.
त्या समारंभासाठी तात्यासाहेब कोल्हटकरांना अध्यक्ष म्हणून बोलवावे, असा गोविंदाग्रज मंडळाचा बेत त्यांनी मला कळविला. "बेत उत्तम आहे. पाठवा त्यांना पत्र" मी सांगितले. जानेवारी म्हणजे वऱ्हाडात थंडीचा कहर, तशात त्या हंगामात तात्यांची पाठ थंडीने भयंकर फुटून अगदी भेगा पडायच्या. फार बेजार व्हायचे त्या दुखण्याने, हे मला माहीत होते. "प्रस्तुत आजारामुळे मी अगदी घरातच पडून असतो, सबब आपली विनंती मान्य करता येणार नाही", असे त्यांचे मंडळाला उत्तर आले. तरुणांची निराशा झाली. अध्यक्ष तात्यासाहेब कोल्हटकरच असले पाहिजेत, असा त्यांनी माझ्याजवळ हेका धरला. "काय वाटेल ते झाले तरी आपण आलेच पाहिजे. तारेने उत्तर द्या." अशी मी जळगाव जामोदला अर्जण्ट तार पाठविली. `येतो` असे तात्काळ उत्तर आले. त्याप्रमाणे तात्यासाहेब आले. जुन्या दादर इंग्लिश स्कूलच्या पिछाडीच्या मोकळ्या जागेत स्टेज उभारले. सभेला मुंबईतील अच्युतराव कोल्हटकरादी सर्व नामांकित मंडळी हजर होती. अध्यक्षीय भाषणाला प्रारंभ करताना तात्या स्मितहास्य करीत म्हणाले
"मित्र हो, माझा धंदा वकिलीचा, आयुष्यात अनेकवेळा मला मृत्यूची वारंटे आली, पण ती सारी मी माझ्या वकिली कसबाने धुडकावून लावली. पण हे माझ्या हातात पडलेले (तारेचा कागद दाखवीत) वारंट पहाताच कसलीही सबब न सांगता मुकाट्याने मला येथे येणे अगदी भागच पडले. ठाकऱ्यांचा हुकूम हा असा करडा असतो. त्यांचा नि माझा आजवरचा ऋणानुबंधच इतका जबरदस्त आहे." सर्व कार्यक्रम यथासांग पार पडला. स्वाध्याय-संदेशाचे उद्घाटन झाले. राजसंन्यासचा प्रयोग तर फर्स्टक्लास फर्स्ट ठरला. रात्री तात्या मुक्कामाला स्वाध्यायाश्रमातच होते. सकाळी ते परतले. पण काव्यशास्त्रविनोदात रंगलेली ती रात्र स्मरणात अजरामर आहे.
स्थितप्रज्ञ दादा कोल्हटकर
यवतमाळ मुक्कामी स्वदेशहितचिंतकांच्या भेटीला सहज एक दिवस अकोल्याचे नामांकित डॉक्टर दत्तात्रय कृष्ण ऊर्फ दादासाहेब कोल्हटकर आले असता, त्यांची माझी दिल्लगी जमली. याला कारण तात्यासाहेब कोल्हटकरांनी आधीच त्यांच्याजवळ माझी केलेली शिफारस. रात्रीचा प्रयोग झाल्यावर दुसरे दिवशी "चला दोन दिवस अकोल्याला आमच्याकडे" असा त्यांनी मला आग्रह केला नि आम्ही दोघे तिकडे गेलो. कोल्हटकर बंधू तीन. दादा थोरले, तात्या मधले आणि दिगंबरराव धाकटे, हे त्यावेळी यवतमाळ येथे सबजज्ज होते. तिघांचीही नावे दत्तात्रयाची. दत्तात्रय, श्रीपाद आणि दिगंबर अकोल्यास दादांचे स्वतःचे घर होते. दवाखाना जोरदार चाललेला. सकाळी आठ वाजता नियमित ते दवाखान्यात जायचे. दादांची एकंदर वृत्ती सुखदुःखे समेकृत्वा लाभालागी जयाजयाँ अशी स्थितप्रज्ञाची.
दानधर्माकडे म्हणजे गोरगरिबांना मदत करण्यात त्यांचा हात सढळ उदार दवाखान्यात उपचारासाठी रोग्यांची वर्दळ चालू असताच गोरक्षणवाले, फंडवाले, अनाथ विद्यार्थी यांचीही वर्दळ असायची. कोण कुठले, काय पाहिजे, वगैरे चौकशी एकदोन मिनिटांत होताच, कंपौंडर, या यांना एक रुपया, द्या यांना पाच रुपये असे हुकूम सुटायचे. रोग्यांच्या औषधासाठी बाटल्यांची उलथापालथ करीत असतानाच बिचाऱ्या कंपौंडरला हे कॅशियरथे काम करावे लागे. "साहेब आता रुपया दिलात, तो इसम फंडगुंड आहे" असे त्याने हळूच सांगितले, तर दादा म्हणायचे, "अरे त्याचं कार्य त्याच्याबरोबर आपल्याला काय करायचे? कधीमधी बिचारा सौ. वहिनी साहेबांकडेही (संध्याकाळची कॅशची पेटी आणून देताना) त्या देकारांची तक्रार करायचा.
वहिनीसाहेबांनी हलकेच तो मुद्दा गप्पाटप्पांच्या भरात नजरेला आणला, तर "असं धरून चालाव का आपण त्याचं काही देणं लागतो, म्हणजे झालं" हे उत्तर मुक्त हास्याच्या खोकाटात मिळायचे. केव्हाही पहा दादा हसतमुख आनंदी, बोलताना दोन्ही डोळे सारखे मिचकविण्याची त्यांना फार लकब होती. घरी फक्त ते, वहिनीसाहेब आणि राजा नावाचा एक वर्ष दीडवर्षाचा मुलगा होता. त्यांना बोलायला फार आवडत असे, म्हणून रोज कोणी ना कोणी तरी पाहुणा पंगतीला असला म्हणजे त्यांना फार आनंद व्हायचा. मग काव्यशास्त्रविनोदाला महापूर यायचा. दिवसभराची व्यवहाराची दगदग उरकल्यावर, रात्री भोजनोत्तर ते एका स्नेह्याच्या घरी भजनाला जायचे.
दहाबारा मडळींचा तो भजनी क्लब होता. अकोल्यास असे तोवर मीही त्यांच्या भजनाला जात असे. म्हणजे ते नेतच असत बरोबर. दादांची प्रवृत्ती धर्मवादी असली तरी सुधारकी आचार विचारांनाही चर्चेत तितकेच आदराचे स्थान असायचे, भजन चालले असताना, डाव्या हातात पेटवलेली विडी आणि उजव्या हातात काड्याची पेटी धरून तिच्यावर टिचकीने ताल धरायचे, मधूनमधून विडीया झुरका आणि त्या टिचक्या चालू असतानाच दादा प्रत्येक पदाच्या अर्थाच्या चिंतनाने सारखे डोलत असायचे. भजनाच्या रंगात ते आजूबाजूला पार विसरलेले दिसायचे,
"जळण्यासारखे असते तेच जळते"
त्यांच्या घराचा एक भाग अपुरा होता. म्हणून सहज मी विचारले, "दादासाहेब, हा एवढाच भाग असा अपुरा का?"
दादा: अहो. ही सारी जुन्या जळिताची नवीन घर बांधणी आहे. आमचे पहिले घर आगीत जळाले. उरलेल्या भागाची होईल तशी रिपेरी होत आहे. याचीही होईल कधीतरी."
त्या आगीची कथा सौ. वहिनीसाहेबांनी मला सांगितली. एक दिवस दादा नित्याप्रमाणे रात्री भजनाला गेले नि अकराच्या सुमाराला घराला आग लागली. आजूबाजूच्या लोकांनी गलका केला, वहिनीसाहेब लगबग करून मुलं नि पैशाची पेटी घेऊन बाहेर पडल्या. आगीचे बंब आले. पाण्याचा मारा चालू झाला. पण दादा कुठे आहेत? भजनाला गेले तरी नक्की कोणाकडे? कारण त्यांच्या दैनिक भजनाचे वार ठरलेले असायने, आज या मित्राच्या घरी तर उद्या त्या मित्राच्या घरी अशा पाळया ठरलेल्या असायच्या, सर्व ठिकाणी शोध घेतल्यावर एका ठिकाणी पत्ता लागला. एका इसमाने तेथे जाऊन घाबऱ्या घाबऱ्या आगीची बातमी त्यांना सांगितली. "बरं येतो, जा, इतके बोलून दादा भजनाच्या रंगात दंग झाले. दुसरा इसम गेला, तिसरा गेला." "अरे हो रे बाबांनो, भजन अर्धवट कसे टाकायचं? झालं. आलंच आटोपत ते निघालोच मी सांगा. आमची मंडळी पडली आहेत ना बाहेर? बस्स तर आलोच मी. व्हा पुढे."
भजन आटोपले. दादा सावकाश नेहमीच्या गतीने चालत आगीच्या जागी आले. वहिनीसाहेब नि राजाला पहाताच म्हणाले, "तुम्ही सुखरूप बाहेर पडलात ना? आणखी ते काय पाहिजे?" इतक्या अवधीत बंबवाल्यांनी आग विझवली होती. वहिनींच्या जवळ पैशांची पेटी होती. दादांनी ती उघडली आणि त्यातली सारी रक्कम बंबवाल्यांना एकेकाला बोलावून बटवडा केली. "शाब्बास, तुम्ही आपले काम फार चोख बजावलेत. कर्तव्यबुद्धी अशीच नेहमी जागरूक ठेवावी." अशी प्रत्येकाला शाबासकी दिली.
"हे काय केलेत? घरापरी घर गेले नि तिजोरीही खलास केलीत?" वहिनीसाहेब शोकाकुल अवस्थेत उद्गारल्या. तशाही प्रसंगात दादांची सदाफुली वृत्ती लयमात्र खिन्नतेकडे झुकली नाही. जणू काय घडलेच नाही, अशा वृत्तीने ते म्हणाले "आहे काय हो रडण्यासारखं यात! जळण्यासारखं असतं तेच जळतं. जळलं घर तर पुन्हा बांधू, पैश्याचेही तेच. रोज येतोय नि जातोय. पण या बहादरांनी आग विझविण्यात जे तातडीचे श्रम साहस केले, त्याची बूज आपण नागरिकानी ठेवायची नाही, तर कोणी? चला पाहू घराचे काय काय उरले आहे ते." स्थितप्रज्ञ वृत्तीचा हा कळसच नव्हे का?
"नाटक उत्तम, पण त्यात राम नाही"
अकोल्यास माझ्या दादांकडे मुक्काम असतानाच तात्या नि दिगंबरराव दोन दिवसांसाठी सहज तेथे आले होते. चर्चा- चिकित्सा-विनोद-टवाळ्यासुद्धा दिवसा रात्री सारख्या चालल्या होत्या. तात्यांच्या वीरतनय नाटकाविषयी बोलणे निघाले. दादा म्हणाले, "हा आमचा तात्या बोलका सुधारक, पण दिगंबर कर्ता सुधारक. त्यानं पहिलाच विवाह विधवेशी केला नि हा आपला नाटक खरडतोय." तात्या गालात हसत होते. दादा पुढे म्हणाले, "हे लोक मला हसतात का? तर मी भजने करतो, रात्री झोपण्यापूर्वी दासबोधाचा एक समास न चुकता वाचतो म्हणून दासबोधातच खरा राम आहे." अहो, तात्यांनी वीरतनय नाटक लिहिले नि मला वाचायला दिले. तसं म्हटलं तर प्रत्येक नाटक आधी मला वाचायला देतोच हं. वीरतनय वाचल्यावर यानं माझा अभिप्राय विचारला. मी काय सांगितलं. "सांगा ना." तात्या हसतहसत म्हणाले, यात काही राम नाही.
दादा : आणि मग यांनी ते श्रीरामा गुणधामा "हे पद भरतवाक्यात घातल्यावर मी सर्टिफिकीट दिले. वीरतनयात राम घातला म्हणूनच ते इतके यशस्वी झालं, समजलात?" म्हणून आम्ही रामाचे भजन करतो. चिंतन करतो, तो आनंद तुम्हा सुधारकांना रे काय होय?
पुनर्जन्म खरा का खोटा?
हा एक सनातन वादाचा मुद्दा आहे. पण कित्येक वेळा तो मानावाच लागतो, याचा दाखला दादांच्या घरीच माझ्या प्रत्ययाला आला. ती कथा अशी चि. राजाच्या आधी दादांना एक सुंदर मुलगी होती. दोघांची ती अगदी जीव की प्राण अशी लाडकी होती. दीडदोन वर्षांची असताना दुर्देवाने ती वारली. मातापित्याला कित्येक दिवस त्या घटनेने मनस्वी व्याकूळ केले. या घटनेला वर्ष दीडवर्ष लोटले.
अचानक एके दिवशी "डॉ. दादा कोल्हटकर, अकोला, इंडिया" या पत्त्यावर त्यांना एक अमेरिकेचे पत्र आले. उघडतात तो त्यात महदाश्चर्य एका अमेरिकन गृहस्थाने लिहिले होते-
`आम्हाला एक मुलगी आहे. सध्या ती दीड वर्षाची आहे. ती बोलू लागल्यापासून कसली तरी आम्हाला अनोळखी अशी भाषा बोलत असते. तिला लहर आली का तीच न तीच वाक्ये सारखी बडबडते. बरेच दिवस गेल्यावर इंडियातून आलेला आमचा एक स्नेही पाहुणा म्हणून आला होता. त्याने तिला ती वाक्ये बोलताना ऐकताच तो चपापला. अहो ही तर शुद्ध मराठी बोलत आहे. `मी डॉक्टर कोल्हटकरांची मुलगी आमचं घर अकोल्याला आहे. माझी आई नि दादा माझी आठवण करतात. त्यांना मला भेटायचं आहे, असं बोलते ही छोकरी अगदी स्पष्ट. हा चमत्कार काय असावा, हे कोडे आम्हाला उलगडत नाही. म्हणून आपल्याकडे चौकशीसाठी मुद्दाम पत्र लिहीत आहे. सोबत आमच्या या कन्येचा फोटोही पाठविला आहे.`
ते पत्र आणि तो मुलीचा फोटो मला दाखवून दादा म्हणाले
"हे पत्र वाचताच आम्हा दोघांनाही हुंदके फुटले. बराच वेळ आम्ही रडतच होतो. त्या पोरीच्या साऱ्या जुन्या आठवणी उचंबळून आल्या. फोटोवरून काय कल्पना होणार? अमेरिकन छोकरी ती. पण आम्हाला आमचीच भेटली, इतक्या उमाळ्याने आम्ही या फोटोचे मुके घेऊन रडत होतो. मग मी त्या अमेरिकन गृहस्थाला भावनापूर्ण शब्दांचे उत्तर आणि आम्हा दोघांचे फोटो पाठवले. त्यावर त्यांचेही उत्तर आले की ते पत्र आमच्या मुलीला वाचून दाखवले नि तुमचा फोटोग्राफही दाखवला. दोन्हीही पाहून ती खूप मनमोकळी हसली. पण त्या क्षणापासून मात्र तिचे ते मराठी बडबडणे बंद झाले."
यावर दादांचा समारोप असा चिकित्सिक सुधारक काहीही म्हणोत, पण भगवंतानं गीतेत "जो सिद्धान्त मांडला आहे. तो खोडून टाकणे कदापि शक्य नाही. माझ्या आयुष्यातली ही एक अविस्मरणीय घटना अनेक चिकित्सकांना नि नास्तिकांना मुद्दाम दाखवतो. उत्तर काय कप्पाळ देणार?"
प्रकरण ८
मी पुस्तकी सुधारक नव्हे
सुधारणाग्रणींची पुस्तके वाचून किंवा त्यांची व्याख्याने ऐकून माझ्या मनाचा कल हिंदूच्या सामाजिक सुधारणा वादाकडे वळलेला नाहीं. माझे बालपण आणि तारुण्यच मुळी अशा काळात गेले की त्यावेळी पांढरपेशा समाजात अनेक संतापजनक रूढी बिनअटकाव बोकाळलेल्या होत्या. तीन बायका खाल्लेल्या साठ वर्षांच्या थेरड्याने खुशाल नऊ-दहा वर्षांच्या कुमारिकेशी लग्नाचा सौदा ठरविला तर त्याचा निषेध कोणी करायचे नाहीत. उलट ते लग्न जमविण्यासाठी शब्द टाकायलाही कोणी लाजायचे शरमायचे नाहीत. अगदी आठ-नऊ ते बारा-तेरा वर्षांपर्यंच्या बालविधवांचे केशवपन घडवून आणायला, म्हणजे त्या बालिकेचा आक्रोश चालू असताना, तिचे हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबून न्हाव्यापुढे जबरीने बसविण्यात पटाईत, अशा धर्ममार्तंड मांगांचीही उणीव पडायची नाही. बालविवाह तर सर्रास चालू होतेच आणि विशेषतः गरिबांच्या पोरी मात्र हटकून पन्नाशी उलटलेल्या विधुरांच्या जाळयात बिनशर्थ सापडल्या जात असत.
मुली पहाण्यास जाण्याच्या प्रघाताविषयी तर मला समजू लागल्यापासून विलक्षण चीड, बायकापुरुषांचे तांडे मुलीला `पहायला येतात, म्हणजे काय पहातात? त्या काळचे ते पहाणारेही असे निर्लज्ज नि निगरगट्ट असायचे की तेरातेरा चौदाचौदा ठिकाणी पहाण्याचा विक्रम करून अखेर यंदा कर्तव्य नाही या उलट निरोप धाडायला त्यांना लवमात्र लाजशरम वाटायची नाही. असले प्रकार माझ्या सभोवार दर लग्नसराईच्या सुमाराला शेकडयांनी घडायचे. पहायला आलेल्या काही फाजील सुधारक मंडळींचा वधुपरीक्षेचा एक नमुना पहाना, त्या मुलीला पंधराहून अधिक वेळा कोणी पाहून गेले होते. स्वरूपाने म्हणाल तर ती खरोखर नावाप्रमाणे सुंदर होती. हुंडा द्यायला बापही तयार होता. शिक्षणही चांगले झालेले होते. तरीही परीक्षेच्या तोंडी पेपरांचा नमुना पहा
शहाणे : मुली, तुला सूप करता येतो का?
मुलगी : (अनेक प्रश्नांमुळे आधीच चिडलेली) सूप करता येतं, रवळ्या, टोपल्या, हारे काय म्हणाल ते करता येतं. तुम्हाला आता काय हवं?
एवढा जबाब ऐकताच हे गाडे आपल्याला जुगणारे नाही. याची खात्री पटताच, परीक्षक बृहस्पती फरारी झाले.
असे अनेक संताप आणणारे प्रसंग पाहून समंजस वडीलधारे लोक हे सारे कां, काय म्हणून सहन करतात? धिक्कार का करीत नाहीत? सोबतची रोज खेळणारी बालमैत्रिण, परवा तिचं लग्न झालं, अवघ्या एकच महिन्यात तिचा नवरा मेला आणि आज ती केशवपन केल्यामुळे स्वयंपाक घराबाहेरही डोकावू शकत नाही. तिला सगळ्यांनी हिडीस फिडीस करावे. काय आहे काय हा अन्याय? आणि तशा अवस्थेत सासरची मंडळी तिला घेऊन जायला आली का माझा संताप अनावर व्हायचा. तिला सासरी नेऊन काय करणार? तर शतमुखी छळ, शिव्या, श्राप हेच ना? मग नेतात तरी कशाला? चालू जमान्यात त्या रूढी जिवंत नसल्यामुळे आजकालच्या लोकांना हे काहीतरी काल्पनिक असावे, असे साहजिकच वाटणार पण त्या राक्षसी प्रकारांमुळेच मी कडवा सुधारक बनत गेलो. देवलांच्या शारदा नाटकातले मर्म सध्याच्या पिढीला अनुभवता येणेच शक्य नाही. आणि खाडिलकरांच्या कीचकवधाचा चटका कर्झनशाहीचा दिल्लीचा दरबार पाहिलेल्या ऐकलेल्या आम्हा त्या काळच्या लोकांना जसा नि जितका बसत असे.
तसा तो आजच्या प्रेक्षकांना कल्पनेनेही अजमावता येणार नाही. एखाद्या बाला-जरठ विवाहाच्या मेजवानीला वडील आजोबांच्या बरोबर गेलो असता श्लोक म्हणण्याचा आग्रह होताच. "मी म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान" हे पद ठणकावून गाताच, पंगतीतल्या मंडळींचे चेहरे कसे पटकन उतरायचे आणि कशाला या कारट्याला श्लोकाचा आग्रह केला म्हणून मनातल्या मनात पस्तावायचे, ते आज सांगून लिहूनही कोणाच्या अटकळीत येईल सांगता येत नाही. सारांश, वडीलधारे काहीही म्हणोत, पण चालले आहे ते ठीक नाही, कोणीतरी धीट पुढाकार घेऊन, जळजळीत धिक्काराचा आवाज उठवला पाहिजे, असे मला वाटायचे.
महारादी मंडळींना का शिवायचे नाही? त्यांच्यातले जे चांगले प्रतिष्ठित आहेत, त्यांच्या घरी चहासुद्धा का घ्यायचा नाही? बालविधवेला विकेशा करणारांना सरकारने खटला भरून तुरुंगात खडी फोडायला का धाडू नये? कोमल बालिकाशी लग्ने ठोकणाऱ्या बिजवर तिजवर म्हाताऱ्यांना गावच्या लोकांनी चिंचेच्या फोकांनी कां फोडून काढू नये? असे काहीतरी माझ्या मनात घोळत असायचे. एक वेळा तर कहरच झाला. माझ्या बरोबरीची खेळ- मैत्रिण मंजू वय अवघे दहा किंवा अकरा आणि तिचा विवाह निळोबा तळोजकर या पासष्ट वर्षांच्या म्हाताऱ्याबरोबर? आमच्या घराशेजारीच फणश्यांच्या अंगणात त्या लग्नाचा मांडव पडला, माझा संताप इतका अनावर झाला की आगकाडी पेटवून मी त्या मांडवाला आग घातली.
एका तरुण विधवेच्या दुर्दशेची आठवण आजही नेहमी मला खिन्न करीत असते. पनवेलला जोशी आळीच्या नाक्यावर बेहेरे नावाच्या ब्राह्मणाचे हाटेल होते. त्याला आम्ही छुपीखानावळ म्हणत असू कारण त्याकाळी हाटेलात खाणे संभावितपणात गणले जात नसे. तेथे जाणारे रस्त्यावर आपल्याला कोणी पहात नाहीना, असा शोध घेऊन मगच आत घुसायचे आणि तरटाच्या आड बसून भजी, भाजी, पुऱ्या खायचे. त्या बेहऱ्याला एक अक्षरशः नक्षत्रासारखी सौंदर्यपूर्ण मुलगी होती. हजारात उठून दिसायची. वय असेल बारा-तेरा. बेहऱ्याने तिचे लग्न थाटामाटात केले. नवरा तरुण होता, पण पोरीचे दुर्दैव ओढवले आणि तो वर्षभरात आटोपला. झाले. बेहऱ्यासारख्या भिक्षुक-भटाची ती मुलगी. अर्थात सारे धर्मसंस्कार यथाविधी झाले नसते तर दोन्हीही कुळे नरकात नसती का गेली? पोरीचे केशवपन करण्यात आले. जात्या ती पोर मनस्वी मोकळ्या मनाची. ती थोडीच घरात बसून राहणार? तशा अवस्थेतही ती चापचोप लाल पेहराव करून खुशाल बाहेर हिंडायची. तिला तशी पहाताच पहाणाऱ्याच्या डोळ्यांना टचकन पाणी फुटायचे. पण तिच्या चेहऱ्यावर मात्र नेहमीचे स्मितहास्य कायम.
ओळखीच्या कोणाही स्त्रीपुरुषांबरोबर, मुलामुलींबरोबर रस्त्यातही ती दिलखुलास हसायची- बोलायची. ती आमच्या कुटुंबाच्याही दाट ओळखीची होती. तिला पहाताच मला त्या केशवपनाच्या रूढीचा मनस्वी संताप यायचा. पन्नाशी साठी उलटलेल्यांना जर लागतील तेवढ्या बायका करण्याची मुभा तर बालविधवांनाच मज्जाव का? का त्यांची पुन्हा लग्ने लावून देत? म्हणे धर्म आडवा येतो! येतो, तर त्या धर्माला छाटला पाहिजे. हिंदू धर्माविषयी एक प्रकारची अढी माझ्या मनात अगदी लहानपणापासून पडत गेली. जो धर्म माणसांना माणुसकीने वागण्याइतपतही सवलत देत नाही, सदानकदा `देवाची इच्छा` या सबबीखाली अश्रापांचा छळ खुशाल होऊ देतो. तो देव तरी कसला नि तो धर्म तरी काय म्हणून माणसांनी जुमानावा? या विचारांनी माझ्या मनात एक नेहमीची पोखरणच घातली म्हणाना.
तशात नाटक मंडळींना बरोबर मी गावोगाव नि शहरोशहरी मुक्कामात असताना तर अनेक वरच्या खालच्या जमातींच्या निरनिराळ्या सामाजिक नि कौटुंबिक अवलोकनांनी हे माझे ग्रह वाढतच गेले. सत्यनारायणाच्या पूजेलाही जायचे मी टाळू लागलो. आजही त्या पूजेची आलेली आमंत्रणे (पाठकोरी असल्यास) चिट्ट्याचपाट्या खरडायला घेतो नि मग कचराटोपलीत भिरकावतो.
मनाच्या अशा अवस्थेत प्रथम माझ्या हातात लोकहितवादींची शिळाछापी शतपत्रे लागली. त्यांच्या अभ्यासाने आचारविचारांची एक नवीन दिशा मला लाभली, अमानुष रुढींविरुद्ध आणि अनेक सामाजिक आचारांविरुद्ध मी केवळ मनातल्या मनात जळफळणारा एक सामान्य, पण त्याविरुद्ध धिटाईने जाहीर आवाज उठविणारा सत्यशोधक, पुरुषार्थी पुरुषोत्तम, या महाराष्ट्रात अवतरला या घटनेचा माझ्या मनावर झालेला परिणाम आजदिनतागायत चढतावाढता जागृत आहे. याच क्षणापासून के. रावबहाद्दूर गोपाळराव हरी देशमुख, लोकहितवादी, या महापुरुषाला माझे परात्पर गुरु म्हणून मनोमन पूजित आठवत असतो. त्यांची आठवण म्हणून लोकहितवादी` नावाचे एक साप्ताहिक पुण्याला एक वर्षभर चालविले होते.
लोकहितवादीनंतर चिपळूकरांच्या निबंधमालेचा अभ्यास करीत असताना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कर्तबगारीकडे मी जिज्ञासेने वळलो. त्यांची सारी पुस्तके मिळविली. लोकहितवादींच्या कलमबहादरीची चमक त्यांत नसली, तरी सामाजिक अन्यायाविरुद्ध तळमळणाऱ्या अल्पशिक्षिताच्या हृदयाच्या विवंचनेचे बोबडे बोल त्यात रसरसत होते. वयाच्या आठव्या वर्षी आजीने "माणसाने माणसाला अस्पृश्य मानणे हे पाप आहे" असा केलेला सक्रीय उपदेश, ज्योतिबांच्या लेखनात मला भरघोस पुराव्यासारखा लागला. त्याचा अभ्यास नाटक मंडळींच्या बरोबर फिरतीवर असतानाच मी केला. कंपनीतील इतर मंडळी वाऱ्यावरच्या गप्पाष्टकांत रंगलेली असताना, हा माणूस रात्रंदिवस जुन्या फाटक्या पुस्तकात माथे घुसवून का बसतो, याचे त्यांना बरेच आश्चर्य वाटायचे.
निश्चित मतांचा अट्टाहास
वैवाहिक बाबतीत सगळा पांढरपेशा समाज भरमसाट वाह्यात असताना माझा जन्म झाला नि बालपणात नि त्यानंतर अनेक वैवाहिक अत्याचारांचे देखावे मी प्रत्यक्ष पाहिले. जरठबाला विवाह काय, बालविधवांचे केशवपन काय, पुनर्विवाहाला बंदी काय, कोणी विधवेशी विवाह केला तर त्याला नि त्याच्या नात्यागोत्यांतल्या सगळ्या कुटुंबांना वाळीत टाकण्याचे थेर काय, सगळे देखावे मी पाहिलेले असल्यामुळे, त्यासंबंधी माझी काही निश्चित मते ठाम ठरून गेलेली होती. श्रीमंताची किंवा साधारण सुखवस्तूची मुलगी आपण करावयाची नाही.
गरिबांतल्या गरिबाची, विशेषतः अचानक दुर्दैवाच्या कचाट्यात सापडल्यामुळे हतबल नि निराश अवस्थेतल्या कुटुंबातील करायची. असे मी ठरवूनच ठेवलेले होते आणि आजी आईची तशी इच्छाही होती. त्यातही पुन्हा एक अट आपण होऊन मुलगी पहायला कोणाच्या घरी जायचे. नाही मुली पहाण्याच्या पद्धतीतही लोक घरेच पाचकळलेले असायचे. मुलीची तेवढी परीक्षा, प्रश्नांचा भडिमार फक्त तिच्यावरच आणि मुलांविषयी मात्र कोणी चकार शब्द काढायचा नाही. हे असे का? त्याचीही परीक्षा घेण्याचा हक्क मुलीकडच्यांना का नसावा? याचे एक गमतीदार उदाहरण सांगतो.
दादर येथे मिरांडाच्या चाळीत रहात असताना, त्याच चाळीत हजीरनीस नावाचा एक तरुण रहात असे. तो होता गेंगाण्या काही दिवसांनी झकपक पोषाख करून बाहेर जाताना तो दिसला. काय हजीरनीस, आज एवढा जामानिमा ? मी विचारले. शेजारचा इसम म्हणाला, "मुलगी बघायला जात आहोत" संध्याकाळी हजरनीस भेटताच मी विचारले, "काय? जमले का लग्न?" गेंगाण्या आवाजात तो म्हणाला. "छे, फिसकटल." कारे? तर म्हणे ती मुलगी गेंगाणी आहे. आता काय म्हणावं या त्रांगड्याला? हा स्वतः गेंगाण्या पण मुलगी गेंगाणी म्हणून हा तिला नाकारतो. समजा, चांगले स्वच्छ बोलणाऱ्या एखाद्या मुलीने हा गेंगाण्या म्हणून नाकारला, तर तिच्या आवडीनिवडीची दखल मात्र कोणीच घ्यायची नाही. असा समाजाचा दंडक. मुलगा सशक्त आहे. कमावता आहे. बस्स, गेंगाण्या असला म्हणून काय झालं? एवढ्यावर लग्ने ठोकली जात असत.
कन्यादान विधीबद्दलही मला असाच तिटकारा आहे. कन्या ही काय एखादी निर्जीव भावनाशून्य वस्तू आहे तर तिचे तुम्ही दान करता? दान होत असलेल्या वस्तूला बरेवाईट, हवेनको म्हणण्याचा हक्कच नाही. "दावे बांधून देईन तिथे मुकाटमोडी गेले पाहिजे" असे अनेक खाटीक बाप मोठ्या दिमाखाने बरळत असत. म्हणूनच मला वाटते पदरी पडले नि पवित्र झाले ही उक्ती विवाहित मुलींच्या तोंडी रूढ झालेली असावी. चालू जमान्यातल्या लव्हाळ्या पोरी आईबापांना धाब्यावर बसवून मन मानेल त्याच्याशी विवाह करतात. पळून जातात. हा साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या कुमारिकांच्या सामाजिक छळाचा एक प्रकारचा सूडच म्हटला तरी चालेल. मात्र अलिकडच्या काही कच्च्या दिलाच्या पोरी, ठरलेले लव्हाळे आईबापाच्या हट्टामुळे सिद्धीला जात नसल्याचे पाहून, आत्महत्येचा जो भ्याड मार्ग पत्करतात. तो मात्र वाईट निंद्यच समजला पाहिजे. "हारखून पारखून मी याला माझा मनोमन पती मानला आहे. हवे ते झाले तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, आईबापाची संमती असो नसो, मला त्याची पर्वा नाही" असला बळकट निर्धार दाखवील तीच खरी गृहिणी होऊ शकते.
माझ्या विवाहाच्या गुप्त खटपटी
स्वदेशहितचिंतकाचा मुक्काम अमरावतीला होता. विवाहाबद्दलची माझी कट्टर मते कंपनीत सर्वश्रुत होती. त्यावेळी दामले नावाचे अमरावतीचे मालमतदार आणि वऱ्हाडच्या कमिशनर ऑफिसातले हेडक्लार्क केशवराव हे दोघे बहुतेक दररोज कंपनीत यायचे. त्या केशवरावांना आम्ही (त्यांच्या मागे अर्थात) अश्वत्थामा म्हणायचे कारण त्यांच्या टक्कल पडलेल्या टाळूला एक खळगा होता. दामले आणि केशवराव आले म्हणजे काही वेळ माझ्या खोलीतही गप्पाटप्पा मारायला यायचे. नाटक मंडळीत असूनही वृत्तपत्रांत बातम्या पाठविणे, लेख लिहिणे, दैनंदिन देशीविदेशी घटनांवर चर्चाचिकित्सा करणे, इत्यादी माझ्या भानगडी अखंड चाललेल्या असत. याच मुक्कामाहून कृष्णराव गोरे यांच्या गायनाचे रेकॉर्डिंग करण्याची व्यवस्था मी लावली होती. दोघांनीही माझी कौटुंबिक स्थिती सहज बोलता बोलता काढून घेतलेली असावी.
अमरावतीला एक प्रभू जातीचे पेन्शनर मामलतदार होते. सरकारी अधिकारी म्हणूनच दामले-केशवराव यांच्या चांगलेच परिचयाचे. त्यांना एकच मुलगी. जवळ पुंजीही चांगली होती. चांगला तरुण मिळाला तर घरजावई करण्याचा त्यांचा बेत. मुलगी इंग्रेजी चार यत्ता शिकलेली. स्वरुपवान, दामले केशवराव यांनी माझी माहिती त्या गृहस्थाला दिली. त्यानेही मला पाहिलेले होते. पण माझी मते त्याकाळच्या रूढीला विसंगत किंवा विचित्र. तेव्हा हे जमावे कसे? मुलगी पहायला हा येणार नाही, पण कदाचित योगायोगाने नजरेला आली किंवा आणली तर मात्र नकार यायचा नाही, हा माझा संकेत पार पाडून हा विवाह जुळवायचाच, असा दामले-केशवराव यांनी चंग बांधला. या कटात जनुभाऊ आणि म्हैसकर (मॅनेजर) सामील करून घेतले. नाटक मंडळयांना गावोगाव कोणी ना कोणी मेजवान्या देतातच. निदान दुपारच्या फराळाला तरी बोलावतातच. बस्स. रावसाहेबांनी कंपनीला फराळाचे आमंत्रण द्यावे. म्हणजे ठाकरे साहाजिक आणि आपोआप त्यात सामील होतील, तेथे आल्यावर मुलगी त्यांना दाखवावी, का काम फत्ते? नकार यायचाच नाही. असा बेत ठरला नि आज दुपारी रावसाहेब यांच्याकडे फराळाला जायचे आहे, तयारीत असा असे फर्मान मॅनेजर म्हैसकरांनी स्वतः फर्मावले. मला या कटाची काही माहिती असणे शक्य नव्हते.
थोड्याच वेळात चिमुरडा किशा काशीकर हसत हसत आला नि म्हणाला, "काय, ठाकरे मामा, आज मामी बघायला जाणार ना?" मी चपापलो. त्याने सारी हकिकत भाबडेपणाने मला श्रुत केली. मनात विचार केला की हा पेन्शनर रावसाहेब श्रीमंत आहे. त्याची मुलगी चांगली शिकलेली आहे. गडगंज हुंडा देऊन याला हवा तो जावई मिळेल. त्यासाठी मीच कशाला? हे माझ्या निश्चित मताच्या विरुद्ध होत आहे. एवढा विचार करून मी सदऱ्याआड टोपी लपवून गुपचूप बाहेर पडलो. फराळाचा प्रोग्राम संपवून मंडळी परत येईपर्यंत लपून बसायचे कोठे? आली एका गृहस्थाची आठवण! गेलो त्याचा पत्ता काढीत. दुपारचे वऱ्हाडचे उन्ह कडाडले होते. अचानक मला आलेला पहाताच त्या गृहस्थाने माझे आगतस्वागत केले. पण अशा भलत्याच वेळी चुकूनही कधी न येणारा हा इसम उन्हाच्या कडाक्यात आला कां नि कशाला? याचा त्याला बोध होईना नि मीही काही खुलासा करण्याचे निर्धाराने टाळले.
मला कंपनीत बेपत्ता पहाताच जनुभाऊ नि म्हैसकर संतापले. करतात काय? गेले सगळे फराळाला आणि आले परत संध्याकाळी. ते येत असताच मी कंपनीत शिरत होतो. "काय हो, घोटाळा केलात हा? कुठे गेला होता अशा उन्हात?" प्रश्नांची सरबत्ती उडाली, शांतपणे मी खुलासा केला, "मला कोणाचा घरजावई व्हायचं नाही आणि सुखवस्तू इसमाची मुलगी तर करायचीच नाही. त्यांच्याजवळ, रगड पैसा आहे. हुंडा देऊन कोणीही लग्नाळू बैल त्यांना विकत घेता येईल. मी कशाला? शिवाय सासऱ्याच्या जिवावर माझ्या कुटुंबाला सुखवस्तूपणाचा मुलामा देण्याची माझी मुळीच इच्छा नाही." दामले-केशवराव यांना माझा खुलासा पटला आणि त्यांनी मला शाबासकीही दिली.
एलिचपूरला मात्र बिनचूक पकडले
कंपनीचा मुक्काम पुढे एलिचपूरला झाला. नजीकच्या परतवाडा येथे जनुभाऊचे भाचे गोविंदराव काळे, वकिलाचे कारकून म्हणून रहात असत. त्यांनी कंपनीची सर्व सोय लावून दिलेली होती, रोज परतवाड्याहून ते एलिचपूरला काय हवेनकोची तरतूद करायला सकाळ संध्याकाळ येत असत. कंपनीच्या सगळ्यांची ते जातीने विचारपूस करायचे. प्रयोग पालू झाले. एक दिवस वर्दी आली की गोविंदराव काळे यांच्या घरी परतवाड्याला सगळ्यांनी मेजवानीला जायचे आहे. आम्ही सर्व गेलो. भोजन आटोपल्यावर, पान खात मंडळी बसली असताना, अचानक एक तरुणी समोर येऊन उभी राहिली. राजारामभाऊ सोहोनी नि कृष्णराव गोरे मला म्हणाले, "अहो कविराज, समोर पहा", मी पाहिले. गोविंदराव काळे म्हणाले. ही मुलगी आणलीय दाखवायला तुम्हाला. तुमच्या जातीचे गुप्ते घराणे. हिचा बाप ही लहान असताना यवतमाळ येथे वारला. नाझर होते ते तेथे कोर्टात. यांच्या मातोश्रीला येथील दामले मास्तरांनी हे पहा ते येथे बसले आहेत, शिकवून येथल्या शाळेत मास्तरणीची नोकरी दिलेली आहे. हिला एक थोरला भाऊ आणि धाकटा भाऊ आहे.
हे चौघांचे कुटुंब आमच्या शेजाराला आज बरीच वर्षे रहात आहे. त्यांचे कल्याण व्हावे, मुले मार्गाला लागावी, ही आमची सगळ्यांची इच्छा. तेव्हा बोला. कसलाही विचार न करता मी सांगितले "पसंत आहे." गोरे-सोहोनी म्हणाले, "अहो, काही प्रश्न विचारा मुलीला", मी म्हणालो, "ही जुनी रूढी मला नापसंत आहे. मी होय म्हटले ते वज्रलेप मात्र माझ्या एका धाकट्या बहिणीचे लग्न जमायचे आहे. ते जमताच विवाह-सिद्धी करता येईल. तोवर यांना थांबावे लागेल. तेवढाही धीर नसेल तर दुसरे स्थळ पहायला ते मोकळे आहेत. माझा शब्द मात्र कायम."
सुमारे पाच-सहा महिन्यांनी नाटक व्यवसाय सोडून आल्यानंतर बहिणीचे लग्न जमले. वरसयी, ता. अलिबाग, जि. कुलाबा येथे दोन्ही विवाह साजरे करण्याचे ठरले. तारेने रक्कम पाठवून परतवाडयाच्या गुप्ते मंडळींना मी मुंबईला अंधेरी येथे बोलावून घेतले. त्यावेळी धाकटा भाऊ यशवंत तेथे पीडब्ल्यूडी मध्ये नोकरीला होता आणि पनवेलची सर्व मंडळी त्याच्याकडेच होती.
नाटक क्षेत्राला रामराम ठोकला
पक्षीय राजकारणाचा आजकालचा धुडगूस सगळ्यांच्या परिचयाचा आहे. नाटकाच्या क्षेत्रातसुद्धा गटबाजीचे नाट्यकारण तितकेच वाह्यात नि पाचकळलेले असायचे. तशात एखादा स्वार्थसाधू चुगलखोर मालकांच्या नाकातला बाल बनला का दोस्तांचे दुस्मानांत रूपांतर व्हायला चोवीस तासही लागत नाहीत. अशाच एका चुगलखोर थापेबाजाच्या करवायांना कंटाळून. इंदोर मुक्कामी मी स्वदेशहितचिंतकांची आणि नाट्यक्षेत्राशी जवळजवळ काडीमोड घेतली. पुन्हा या क्षेत्राच्या वाटेला जायचे नाही. झाले इतके जन्माचे नाटक पुरे झाले, अशा निर्धाराने जीवनाचा नवीन मार्ग शोधण्यासाठी ठाणे येथे यशवंताकडे आलो. (जानेवारी १९०९).
पनवेलचे सर्व कुटुंब तेथेच होते. मी आल्याचे कळताच, बच्चू मास्तरने अचानक एक दिवस ठाणे स्टेशनवरचा एक तिकीट कलेक्टर माझ्या बिऱ्हाडी पाठवून मला बोलावून घेतले. त्यावेळी माथेरान स्टीम ट्राम्बे आदमजी पीरमॉय कंपनीकडून जीआयपीने आपल्या ताब्यात घेतली होती आणि बच्चू मास्तर नेरळ येथे ट्राफिक सुपरिंटेंडंट म्हणून नेमला गेला होता. "हे पहा, झाली इतकी वणवण आता पुरे. चल माझ्याबरोबर नेरळला. आपण काहीतरी मार्ग काढू." असे म्हणून बच्चू मास्तरने मला तसेच नेरळला नेले. दोनतीन दिवस आम्ही खूप चर्चा केली. टायपिंग शिकावे अशी इच्छा मी व्यक्त करताच. "एवढेच ना? त्यात शिकायचे काय? मशिन घ्यायचे आणि लागायचे कामाला. हा घे न्यू ब्रँड अॅडलर टाइपरायटर, जा घेऊन आणि कर सुरवात. पुढची व्यवस्था मी लावलेली आहे." बच्चू मास्तरने खडसावून सांगितले. ठाण्याला येऊन टायपिंगची प्रॅक्टिस करू लागलो.
छापखान्याची शाई पुन्हा बळावली
एकदोन दिवसाआड मुंबईला खेप मारून, वृत्तपत्र क्षेत्रातील जुन्या दोस्तांच्या गाठीभेटी घेत असतानाच, सोशल सर्विस लीगचे एक आजीव सदस्य आणि त्यावेळी कामगार चळवळीचे उत्थान करण्यासाठी चालू असलेल्या कामगार समाचार साप्ताहिकाचे संपादक पुरुषोत्तम गोविंद काणेकर ऊर्फ शारदाश्रमवासी यांनी मला कामगार समाचारासाठी मनोरंजक गोष्टी लिहिण्याचे काम दिले. इतकेच नव्हे तर मुंबईला माझा मुक्काम पडल्यावर सांजसकाळ ते आपल्याबरोबर मला खानावळीत जेवायलाही घेऊन जायचे. मुंबई वैभव` दैनिकाचा पार्वतिवरदा प्रेस सर्व्हंट्स ऑफ इंडियाने नुकताच खरेदी केलेला होता. मुगभाट गल्ली आणि कांदेवाडीच्या जंक्शनवर त्यावेळी तो होता. येथेच प्रथम कामगार समाचार साप्ताहिक निघत असे.
गोष्टी, कथा, कादंबऱ्या लिहिण्याची मला आवड नाही. मूळ नाद लागला होता इतिहासाचा. ऐतिहासिक सत्यशोधनाचा. काणेकर तर मनोरंजक गोष्टी मागताहेत काय करावे? बरं, त्या काही फुकट मागत नाहीत चांगला कालमला एक ठणठणीत रुपया देणार विचार करीत करीत ठाण्याला परतत होतो, तोच ठाकुरद्वार रस्त्यावर जुनीपुराणी पुस्तके, काही इंग्रेजी मासिके विकणारा दृष्टीस पडला. रेड मॅगझिनची प्रत दोन दिडक्याला खरेदी केली. बोरीबंदरला गाडीत बसल्यावर चाळणी केली. एका कथेच्या मथळयावर तुफानात बुडत असलेल्या बोटीचे चित्र नजरेला पडले. नुकतीच रत्नागिरीला जाणारी एक बोड बुडून, फार मोठा हाहाकार उडाला होता.
मी ती कथा संपूर्ण वाचली आणि घरी येताच. त्याच रत्नागिरीच्या बोटीच्या अपघाताची पार्श्वभूमी घेऊन, एक स्वतंत्र तपशिलाची कथा अगाध किति विधिकरणी मथळ्याची लिहायला घेतली. अरेच्या! मला कथाही लिहिता येते! सुमारे शंभर फूलस्केप कथा लिहून झाली. काणेकरांना दाखवली. त्यांना पसंत पडली. अगदी खुष झाले. कामगार समाचारात हप्त्याने छापली जाऊ लागली. सुमारे पंच्याहत्तर कालम भरली. एका खेपेला काणेकरांनी "चला, आज तुम्हाला दक्षिणांपांतू करून टाकतो असे म्हणून मला गोपाळराव देवधरांकडे नेले. देवधरांची नि माझी ही पहिलीच भेट. "हो हो, ती समाचारातली कादंबरी ना? फार छान लिहिलीत." देवधर म्हणाले.
काणेकर : यांना मुषाहिरा द्यायचा आहे.
देवधर : आपला काय नियम असेल त्याप्रमाणे द्या.
काणेकरांनी एक चिठ्ठी पुढे केली. त्यावर देवधरांनी सही केली. "आणखी काही असेच लिहीत जा, बरं का" असे देवधरांनी उत्तेजन दिले. कॅशियरने आम्हास पंच्याहत्तर रुपये पेड केले.
"चल, आत्ताच चल माझ्याबरोबर"
बेकार म्हणून ठाण्याला आल्यानंतरची ही एवढी कमाई !मोठ्या आनंदाने जाण्यासाठी बोरीबंदरवर येतो तोच समोर बच्चू मास्तरांची धिप्पाड मूर्ती उभी. "बरं झालं भेटलास, मी तुझ्याकडेच येणार होतो आत्ता. चल, आत्ताच चल माझ्याबरोबर. तुझ्या नोकरीची सोय लावली आहे." विक्टोरिया करून आम्ही गिरगाव चर्नीरोड जंक्शनजवळील इस्माईल बिल्डिंग येथे गणेश नारायण ऊर्फ तात्यासाहेब परांजपे यांच्या बिऱ्हाडी गेलो.
तात्यासाहेब परांजप्यांची राम एजन्सी व्यापारी वर्गाचे रेलवे क्लेम्स वसूल करून देणारे एक ऑफिस होते. प्रथम ते जीआयपीमध्ये क्लेम्स खात्याचे सुपरिटेंडंट म्हणून बरीच वर्षे होते. नंतर ते आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे केरोबा दाते यांच्यासह रेल्वेची नोकरी सोडून राम एजन्सी चालवू लागले. शेकडो व्यापाऱ्यांची कामे या एजन्सीमार्फत चालत असत.
मी भेटलो त्या सुमाराला तात्यासाहेबांनी रामभाऊ नूलकर आणि पारधी यांना भागीत घेऊन, कमर्शल बैंकिंग ट्रेडिंग अॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग एजन्सी नावाचा एक नवीन उद्योग चालू केला होता. अॅडलर टाइपरायटर्स, रोनिओ डुप्लिकेटर्स आणि सिक्लोनेट नावाच्या तीनचाकी जर्मन मोटरगाडया यांची इंडिया, बर्मा अॅण्ड सीलोनची सोल एजन्सी घेतलेली होती. भेट होताच तात्यासाहेबांनी मला काही प्रश्न विचारले आणि उद्या किंवा परवा तुम्हाला जमेल तसे ऑफिसात येऊन भेटा. असे सांगितले. (सप्टेंबर १९०९)
मी अपटुडेट बॉम्बे जण्टलमन बनतो
यशवंताचे बिऱ्हाड ठाणे येथे होते, तरी तेथून त्याला अंधेरी येथील ऑफिसात रोज जावेयावे लागे, हा त्रास चुकविण्यासाठी अंधेरीलाच एक छोटेखाली बंगला घेऊन, आम्ही सर्व तेथे गेलो होतो. दुसऱ्या दिवशी जुम्मा मशीद मोहोल्यात राम एजन्सीच्या ऑफिसात हजर झालो. भेटताच तात्यासाहेब म्हणाले,
"हे पहा, आमच्या येथे अॅडलर टाइपरायटर्स, रोनिओ डुप्लिकेटर्स वगैरे विलायती नि जर्मन माल विक्रीला असतो. तुमचे इंग्रेजी भाषेवर चांगले प्रभुत्व आहे आणि संभाषणचातुर्यही आहे. आमचे सेल्समन म्हणून सर्व देशीविदेशी कंपन्यांत कॅन्व्हासिंगला तुम्हाला फिरायचे आहे. पगार सध्या चाळीस रुपये फिरती खर्च निराळा. आमचे मॅनेजर काशीनाथपंत येवलेकरांबरोबर समोरच्या क्रॉफर्ड मार्केटात रेडिमेड कपड्यांच्या दुकानात जा. धोतर सदरा-कोट- फेट्याचा हा जामानिमा ठेवा गुंडाळून, नेकटॉय-कॉलर-हॅटपॅण्टवाले सेल्समन् व्हायचे आहे आता तुम्हाला."
झाले. एक तासाच्या अवधीत नूर पालटला. फेल्टहॅट बूटात मी बॉम्बे जण्टलमन बनलो. सारा खर्च एजन्सीने केला. रोज दहा ते दीडदोन वाजेपर्यंत पाच-सहा व्यापारी फर्मच्या मॅनेजराना भेटायचे, टाइपरायटर डुप्लिकेटरचे लिटरेचर देऊन वर थोडी हस्तिदंती आग्रहाची फोडणी द्यायची आणि दोन वाजता कचेरीत परत येऊन केल्या कामाचा रिपोर्ट द्यायचा. बाकीचा वेळ कचेरीत तात्यासाहेब डिक्टेट करतील ती पत्रे टायपाची, असा क्रम चालू झाला. सेल्समनशिपच्या कामगिरीमुळे, नानाविध देशीपरदेशी मोठमोठ्या व्यक्तींच्या ओळखीचे माझे क्षेत्र वाढत गेले. जर्मन, ब्रिटिश, अमेरिकन, जपानी, कितीतरी मोठमोठ्या कंपन्यांच्या मॅनेजरांशी मित्रत्वाचा शेकहॅण्ड करण्याचे योग आले. कित्येक ठिकाणी अॅडलर टाइपरायटरचे मशीन नेऊन, त्याचे डेमॉन्स्ट्रेशनही करावे लागत असे.
पण ते कामही सरळ सोपे नव्हते
सन १९०९-१० सालात किमान तीस-चाळीस निरनिराळ्या ब्रॅण्डचे टाइपरायटर्स मुंबईच्या बाजारात चढाओढीला ठाण मांडून बसले होते. हॅमण्ड, डेन्सफोर, ब्लिक, बारलॉक, स्मिथ, ऑलिव्हर, किती नावे सांगावी? शिवाय, सरकारी खात्यात विक्रीची मंजुरी मिळालेला रेमिंग्टन घरजावयासारखा चढाओढीला कोठेही हजर. विक्रीचे संभाव्य ठिकाण कळल्यावर आपण तेथे जावे तो अनेक टाइपरायटरांचे कॅन्व्हासर आधीच जेठा मारून बसलेले दिसायचे. अशा झुंबडीत एकेकाची टेस्ट घेताना घेणारेसुद्धा त्रासायचे नि "ठीक आहे. कळवू आम्ही मागाहून आता जा." म्हणून सगळ्यांना हुसकावून द्यायचे. अशा भानगडीतून निवांतपणे खरेदीदार हापसरांची भेट घेणे जितके कुशलतेचे तितकेच खटपटीचे असे. तशाही अवस्थेत पहिल्याच महिन्याला पोर्ट ट्रस्टच्या ऑफिसाला मी दोन टाइपरायटर्स विकण्याची शर्यत जिंकली.
स्लोन-डुप्लोयन फोनोग्राफीचा योगायोग
फास्ट पण करेक्ट टायपिंगमध्ये मी कोणाला हार जात नसे. पण शॉर्टहॅण्ड नसल्यामुळे फार अडचण व्हायची. तात्यासाहेबांची रोज तीस-चाळीस पत्रे असायची. फायल्यांचा ढिगारा घेऊन ते माझ्या शेजारी येऊन बसायचे नि डिक्टेट करायचे. त्यांच्या तोंडून शब्द निघण्याची थांतड तो तत्क्षणी टाइप व्हायचा. इतकी माझी स्पीड असे. मी शॉर्टहॅण्ड शिकावे, ही तात्यासाहेबांची फार इच्छा. "तुम्ही क्लास जॉईन करा, फी मी देतो" असा आग्रह चालूच होता. एक दिवस एका क्लासात गेलो. पिटमन पद्धती पाहिली. म्हटल ही घोकंपट्टी नि ते ग्रामालॉग्ज, आपल्याला नाही परवडणार. सांगितले तसे तात्यासाहेबांना, त्यांनी लगेच एक पत्र डिक्टेट केले रोनिओ लिमिटेड कंपनी, लंडनला "आमच्याजवळ एक क्रॅक हेडेड फास्ट टायपिस्ट आहे.
सहज बिछान्यात लोळता लोळता शॉर्टहॅण्डची कला त्याला शिकायची आहे. आहे का आपल्यापाशी काही तोडगा?" पत्र रवाना झाले. एक महिन्याने स्लोन-डुप्लोयन फोनोग्राफीची दोन छोटी (क्रॉन साइझ सोळा-सोळा पानांची) पुस्तके आली. उत्तरात लिहिले होते की "तुमच्या कॉन्झरवेटिव इंडियात रेमिंग्टन मीन्स टाइपरायटर आणि शॉर्टहॅण्ड मीन्स पिटमन एवढीच अकलेची बाजारपेठ आहे. जगात एकंदर दीडशे वर लघुलेखनाच्या पद्धती आहेत. अमेरिकेत बॉइड सिस्टिम आणि इकडे स्लोन सिस्टिम. ही दोन पुस्तके तुमच्या त्या वंडरफुल टायपिस्टला द्या आणि पहा काय चमत्कार होतो तो"
स्लोन फोनोग्राफीने हुन्नराचे नवे क्षेत्र
या पद्धतीचे अवघे बारा धडे आणि प्रत्येक धड्यात एकदोन सोपे नियम असल्यामुळे पुस्तकें हातात पडताच मी निष्ठेने अभ्यास चालू केला. पुष्कळ वेळा तात्यासाहेबांचे डिक्टेशन मी अब्रीविअटेड लॉगहँड मध्ये घेत असे. ही पद्धत ज्याची त्यानेच बसवायची असते. स्लोनच्या अभ्यासाला सुरुवात केल्यावर एकाच आठवड्यात मी फोनोग्राफीच्या काही खुणा भराभर वापरू लागलो. त्या पहाताच तात्यासाहेब म्हणाले. "काय? पचनी पडली वाटतं ही सिस्टिम?" बारा धड्यांचा कोर्स पुरा झाल्यावर रोज रात्री तास दीडतास प्रॅक्टिस चालू केली. माझे शेजारचे स्नेही कै. शंकर सीताराम ऊर्फ बाबूराव बेन्द्रे रोज नियमाने मला इंग्रेजी डिक्टेशन घालीत असत. त्यांना इंग्रेजी वाचनाची पद्धत माझ्यापासून शिकायची असे आणि मला फोनोग्राफीची प्रॅक्टिस करायची होती. एक महिन्याच्या सरावाने मी साठ-सत्तर ते शंभर शब्दांपर्यंत भराभर लघुलेखन करू लागलो. एक नवी कला आत्मसात झाली.
दोन-तीन महिन्यांच्या अवधीत एक संधी आली. जुन्या दादर इंग्लिश स्कूलच्या हॉलमध्ये नेल्सन फ्रेजर नावाचे मुंबईच्या ट्रेनिंग कॉलेजचे प्रिंसिपॉल यांचे `नेशन, नॅशनॅलिटी अॅण्ड नॅशनॅलिझम्` या विषयावर जाहीर व्याख्यान होते, ते मी शब्दश: स्लोन सिस्टिमने उतरून, त्याचे ट्रान्सक्रिप्शन (शब्दीकरण) टाइप करून, फ्रेजरना नेऊन दिले. त्यांनी ते वाचले आणि तीन-चार चुका दाखवून एक्सलण्ट म्हणून शाबासकी दिली. दुसऱ्या दिवशी ते `बॉम्बे क्रॉनिकल` मध्ये समग्र छापून आले. स्लोन सिस्टिमवरचा माझा आत्मविश्वास भक्कम झाला.
ही पद्धत इतर पद्धतीप्रमाणे विसरली जात नाही. गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षात ती सोडली, आज उजवा हातही काम देत नाही, तरी सावकाश का होईना, मी ती वापरू शकतो.
दादरला गृहस्थाश्रम चालू झाला
सन १९१० च्या जानेवारीत माझा विवाह अलिबागनजीक वरसीली येथे झाला. तेथील घरंदाज कुळकर्णी यांच्याशी बहिणीचा विवाह झाला. दोन्ही कार्ये एकाच ठिकाणी साजरी करण्यात आली. विवाहानंतर अंधेरी सोडून आम्ही दादर येथे नवीनच बांधलेल्या मिरांडाच्या चाळीत वस्तीला आलो. दादरचा नि माझा संबंध प्रथम सन १९०५ चा असला, तरी गृहे तिष्ठति यः सः गृहस्थ म्हणून सन १९१० ला येथील माझी वसती अथवा वसाहत कायम झाली. म्हणजे आज साठावर वर्षे मी दादरकर म्हणून येथे आहे.
बच्चू मास्तरचा अकाल मृत्यू
बच्चू मास्तर नेरळला ट्राफिक सुपरीटेंडेंट असताना, एक दिवस जिना उतरत असताना पाय घसरून धडाड खाली पायथ्याशी येऊन कोसळला. खूप मार लागला. प्रचंडदेही आदमी तो. आजार चालू झाला. तात्यासाहेबांनी उपचारासाठी मुंबईला आणले, खूप उपचार झाले, पण प्रकृती सारखी बिघडतच गेली. अखेर त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला चाळीसगावला तात्यासाहेबांच्या घरी नेण्यात आले. स्टेशनवर मी गेलो. पण त्याची आमची सगळ्यांची तीच अखेरची भेट, असे आम्हाला वाटले नाही. आणि…आणि… चार-पाच दिवसांनीच पत्र आले की बच्चू मास्तर वारला. बच्चू मास्तरचा नि माझा दोन-तीन वर्षांचा निकट संबंध, त्याच्या स्नेहाचे नि उपकारांचे किती वर्णन करावे? पण त्याचे खरे पूर्ण नाव अखेरपर्यंत मला कळले. नाही.
त्याचे दहन न होता, जातिरिवाजानुसार दफन करण्यात आले, कां? तर तो म्हणे लिंगायत होता, असा खुलासा कळला, त्याचा नि परांजपे घराण्याचा अगदी बालपणापासून निकटचा संबंध, स्नेहधर्माच्या पवित्र क्षेत्रात कसली आलीय जातपात नि नावगाव तरी कशाला कोण विचारतो? आजकाल हव्या त्या सटरफटराचे नाव समाजसेवक म्हणून वृत्तपत्री मृत्युलेखात येते. बच्चू मास्तराने शेकडो लोकांना रेल्वेत अन्नाला लावले, कितीतरी नाटक मंडळ्यांच्या संकटात तो त्यांच्या धावण्याला धावला. अनेक व्यापाऱ्यांना रेल्वेची कंत्राटे दिली, त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी वजन खर्च केले, पण एकाही वर्तमानपत्रात त्याच्या मृत्यूचा उल्लेख आला नाही.
शुक्रवार शनिवारची मुंबईची धावपळ
पहिल्या महायुद्धापूर्वीचा तो काळ. (सन १९१० ते १९१४) लंडन, बर्लिन, बेल्जम्, पॅरिस आणि अमेरिका म्हणजे व्यापारी क्षेत्रात परसातल्या शेवग्यासारखे आम्हांला अगदी नजीकचे वाटायचे. हात घातला का शेंगाच शेंगा. हा सर्व व्यवहार बोटीच्या टपालाने व्हायचा. या सगळ्या परदेशांचे टपाल दर शुक्रवारी सकाळी नऊ-दहाच्या सुमाराला प्रत्येक व्यापारी पेढ्यांवर, बँकांत आणि लहान-मोठ्या सर्व कचेऱ्यांत येऊन धडकायचे, शुक्रवार म्हणजे मोठा धामधुमीचा दिवस. त्या दिवशी एक तास आधी कचेऱ्या बँकांतले हापसर, कामदार नि कामगार बिनचूक हजर. या दिवशी कोणाची गाठभेट व्हायची नाही. आलेल्या टपालाच्या ढिगाऱ्यातील शेकडो पत्रांतील भानगडीचा फडशा पाडण्यात मॅनेजरांपासून तो निरोप्या शिपायांपर्यंत सगळ्यांची एकच धावपळ उडालेली असायची.
टाइपरायटर्स सारखे खडाडत असायचे. वर मान करायलाही कोणाला उसंत मिळायचा नाही. टेलिफोन खणाणत असायचे सारखे. मोठमोठ्या पेढ्यांत बँकांत रात्री नऊ-नऊ, दहा-दहा वाजेतोवर कामांचा रगाडा चाललेला. रस्त्यात मित्र भेटला तरी तो पहायचा नाही तुमच्याकडे. शनिवारी तर सकाळी आठच्या सुमारालाच हापिसे झगमगायला लागायची, फॉरीन मेलची पाकिटे, मोठमोठे लखोटे, पार्सले यावर तिकिटे लावणे, सिले करणे इत्यादी कामांत शिपायांची त्रेधातिरपीट उडायची.
आमची कमर्शल एजन्सीही परदेशी व्यापार करीत असल्यामुळे, तेथेही हाच प्रकार चालायचा. फॉरीन मेल बोरीबंदरनजीकच्या सेण्ट्रल पोस्टात बरोबर बाराच्या आत पडलीच पाहिजे. एक क्षण उशीर झाला का धडाड एक मोठी फळी आतून पेटीच्या तोंडाआड येऊन पडायची. मग लेट फीच्या खिडक्यांवर लोकांची गर्दी. आठवडयाचे टपाल बाराच्या मुहुर्तावर एकदा टपालात पडले रे पडले का हापिसे सुटली. साहेब लोक तर पत्रांवर सह्या करून अकराच्या सुमारालाच बाहेर पडायचे. मग कोट विभागात एकदम सारा शुकशुकाट, चिटपाखरू नाही भेटायचे.
ऑटिंगवाल्यांची चर्चगेटला गचडी
त्याकाळी वांदऱ्यापासून पुढे विरारपर्यंत फारशी वस्ती नव्हती. ताडामाडांची झाडे, बागबगिचे, ठिकठिकाणी लहानसान बंगले, वाड्या असल्यामुळे, शेकडो मंडळी साप्ताहिक श्रमपरिहारासाठी या भागात कोठे ना कोठे प्लेजर ट्रीपला हमखास जात असत. म्हणजे शनिवारी घरून हापिसात जायला निघालेला असामी सोमवारी सकाळी घरी परतायचा आणि लगेच स्नान उरकून किंवा घाईघाईने घोंडभट्टी करून हापिसाला धावायचा. साप्ताहिक प्लेजर ट्रिपा नियमित काढणारे कित्येक क्लबच असत. त्यांचा नमुना आज पहायला मिळत नाही. क्वचित कै. त्रिलोकेकर यांचे `हुंडा` नाटक पहाण्याचा योग आला तर तेथे मात्र त्या प्लेजर पार्टीचा देखावा खासा रंगविलेला दिसेल.
व्यापार क्षेत्रातला दृष्टीचा विकास
पंचखंड दुनियेतील मोठमोठ्या राजधान्यांतल्या व्यापारी हालचालींची, जाहिरात कलेची. नवनवीन शोधांची अनेक नियतकालिके तात्यासाहेब परांजपे वर्गणी भरून मागवीत असत. ती आली का एकदा वरवर चाळायची नि शिपायाकडून माझ्या टेबलावर पाठवायची. मला ती तपशीलवार अभ्यासावीच लागत. कारण, चटकन एखाद दिवशी ते मला एखाद्या माहितीविषयी विचारायचे. लंडनचे `मरकंटाइल गार्डियन` नावाचे एक जाडजूड साप्ताहिक येत असे. फार मोठे फटकळ नि कोणाचीही भीडमुक्त न ठेवणारे असे. एकदा आम्ही कसल्याशा मालाची जाहिरात पाहिली आणि त्याचा नमुना मागविण्यासाठी पाच पौण्डाचा ड्राफ्ट चार्टर्ड बॅन्केमध्ये घेण्यासाठी मला पाठविले. ते साप्ताहिक घेऊन ट्रामने मी बॅन्केत जात असता, सहजगत्या वाचीत असताना, तो माल विकणारी कंपनी लबाड-लुच्ची आहे, असा मजकूर नजरेला पडला. दिवस शनिवारचा. बॅन्केने ड्राफ्ट तयार ठेवला होता. बाराच्या आत आमची ऑर्डर ड्राफ्टसह पोस्टात पडणे जरूर वाजले होते साडेदहा. मी तसाच परत आफिसात आलो. "काय? आणलात ड्राफ्ट?" तात्यासाहेबांनी विचारले. मी "नाही. हे पहा इथं काय छापून आलंय ते." वाचल्यावर तात्यासाहेब- "अहो बरं झालं. फसलो असतो आपण पंच्याहत्तर-ऐंशी रुपयांना हकनाहक." लगेच त्यांनी चार्टर्ड बॅन्केला फोन करून ड्राफ्ट कॅन्सल करविला.
तात्यासाहेब पाहिलंत. असा अभ्यास ठेवला पाहिजे. नाहीतर एवढी फॉरीन साप्ताहिके मासिके मागविण्यात अर्थच काय?
सगळ्या हुन्नरांना उत्तेजन
राम एजन्सीचा रेल्वे क्लेम्स वसूल करण्याचा व्यवहार तसाच स्वतंत्र चालवून, कमर्शल एजन्सीचा परदेशी मालाचा व्यापार वाढला. कोटात स्वतंत्र हापीस थाटले गेले. सन १९१० त अलाहाबाद येथे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनात अॅडलर टाइपरायटर्स, रोनियो आणि इतर लहानमोठे डुप्लिकेटर्स आणि जर्मन सिक्लोनेट मोटरगाड्या, रामभाऊ नूलकर आणि पारधी यांच्या खास देखरेखीखाली ठेवण्यात आल्या. कोटातल्या हापिसात दोन गोरे युरोपियन मॅनेजर नेमण्यात आले. सर्व कारभार तात्यासाहेब परांजप्यांच्या नियंत्रणाने होत होता. कोटातल्या कचेरीत टाइपरायटर्स, डुप्लिकेटर्स, रोनियो कॉपियर्स इत्यादी सर्व यंत्रे रिपेर करण्याचे एक बारीकसे वर्कशॉपही चालविण्यात आले.
या सर्व कारखान्यांत माझ्या अंगी असलेल्या हरहुन्नरांना तात्यासाहेब यथासंधी उत्तेजन देत गेले. एकदा प्रो. बोस नावाचे तात्यासाहेबांचे बंगाली हिप्नॉटिस्ट स्नेही मुंबईला जाहीर कार्यक्रम करायला आले. ते सरदारगृहात उतरले होते. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीकरणाचे म्हणजे चालू भाषेत पब्लिक शिट्टीचे काम तात्यासाहेबांनी पत्करले. सध्यासारखी अनेकमुखी जाहिरातबाजीची तेव्हा फार जरूर नसे. कोटातल्या चार-पाच नाक्यांवर कापडी होर्डिंगे फडकावली का काम भागत असे. हे काम कोणातरी धंदेवाईक पेण्टराला देण्याचे मला सांगताच, "कशाला? मी करू शकतो हे काम." असे सांगताच ते काम त्यांनी मला दिले. मी ते दोन-तीन दिवस घरी रात्री जागून झकास पुरे केले. नाक्यानाक्यावर लावण्याचे कंत्राट तेवढे कोणाला तरी दिले. व्हायिटने लेडलॉ कंपनीच्या सोनेरी प्रचंड अक्षरांवर सोनेरी वर्ख चढविण्याचे काम त्यांनी असेच मिळविले नि मला दिले. उद्देश एवढाच की कंपनीला तर चाळीस रु. पेक्षा अधिक तनखा मला देता येत नाही आणि माझ्या अंगात हुन्नर आहे. त्याला उत्तेजन देऊन, फावल्या वेळात जादा कमाई करण्याची मिळेल ती संधी मला द्यावी.
इतकेच काय, पण कोटातल्या रिपेरिंग वर्कशॉपमध्येही काही वेळ काम करून, ते काम शिकण्याचीही त्यांनी मला परवानगी दिली. याचा परिणाम असा झाला की व्यवस्थापक मंडळात प्रसिद्धीकरणाची कसलीही नवीन कल्पना निघाली की प्रथम तात्यासाहेब. नूलकर आणि पारधी माझ्यापाशी चर्चा करायचे, वॉश ड्राइंगची लेटर हेड्स तयार करणे, लाइन किंवा झिंको ब्लॉक्स तयार करवून घेणे, जाहिरातींचे सचित्र मसुदे तयार करणे, कोणतेही काम असो, "होय, मी करतो" की ते असे सांगताच ते काम माझ्या हाती सोपविण्यात येत असे. सारांश, कमर्शल एजन्सीचे मी एक हुकमी तोंडीलावणेच होऊन बसलो. या विविध कलांना उपयोगी पडणारे फॉरीन लिटरेचर, मासिके वगैरे मागविण्यात येऊन, ती येताच माझ्या टेबलावर पाठविण्यात येत असत. जाहिरातकलेच्या शिक्षणासाठी लंडनचे अॅटॉयलिंग अॅडव्हर्टायझिंग हे जाडजूड सचित्र मासिकही वर्गणी भरून मागविण्यात येत असे. त्या कलेचा पायाशुद्ध अभ्यास मला अनेक प्रसंगी कल्पतरूसारखा उपयोगी पडला.
स्कूल ऑफ मॉडर्न लँग्वेजीस
कोटात ताज बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर गो (GAULT) नावाच्या एका फ्रेंच इसमाने फ्रेंच भाषा शिकविणारे फ्रेंच स्कूल चालविले होते. ते बरेच प्रसिद्ध होते. अंदाजे तीस-चाळीस विद्यार्थी तेथे शिक्षण घेत असत. त्या फ्रेंच इसमाला स्वदेशी कायमचे जायचे होते, म्हणून ती शाळा पुढे चालविण्यासाठी गुडविलने विकण्याची त्याने टाइम्स ऑफ इंडियात जाहिरात दिली. तात्यासाहेबांनी सौदा केला. नुसती फ्रेंच भाषाच काय, सर्व युरोपियन भाषा आणि मराठीसुद्धा शिकविणारे एक विशाल स्कूल ऑफ मॉडर्न लँग्वेजीस चालू करण्याची योजना सिद्ध झाली. त्यासाठी पतियाळाच्या महाराजांना फ्रेंच शिकविणारा डेरोश (DESROCHES) नावाचा फ्रेंच शिक्षक प्रिंसिपल म्हणून दरमहा रु. पाचशेवर नेमण्यात आला. इंग्रेजीसाठी मिस् ब्लण्डेल आणि जर्मन, इटालियन, रशियन, जपानीसाठी त्या त्या मातृभाषेचे प्रवीण प्रोफेसर्स नेमण्यात आले. त्यांची नावे आता आठवत नाहीत. आणि अस्मादिकांची मराठीचे प्रोफेसर म्हणून नेमणूक झाली.
भलत्याच उच्चारांनी मिळालेल्या थपडा
इंग्रज, फ्रेंच, जर्मनादी कित्येक नाये स्पेलिंगाप्रमाणे उच्चारण्याची आपली पद्धत. पण त्याबाबत मला काही ठिकाणी चांगल्याच चपराका खाव्या लागल्या. फ्रेंच स्कूलचा गो याच्या नावाचे स्पेलिंग होते GAULT. कागदोपत्री मी ते वाचले होते. त्याची प्रथम भेट घेण्यासाठी तात्यासाहेबांनी त्याच्याकडे मला पाठवले. तो लेकाचा इंग्रेजी जेमतेमच बोलत असे. आमचा इण्टरव्यू कसा झाला ते पहा
मी : गुड मॉर्निंग, मिस्टर गॉल्ट.
तो : (मोठ्याने अंगावर खेकसून) गोsss!
मी : - I have been sent by Mr. Paranjape to see you मिस्टर गॉल्ट...
तो : (अंगावर धावून आणखी मोठ्याने) गोsss!
मला त्याच्या या वर्तनाचा काही बोधच होईना. गो तर गो, झक मारतोस तू. हा मी चाललो. असे मनात म्हणून मी तसाच तडक खाली उतरलो आणि तात्यासाहेबांना झालेली हकिकत सांगितली. ते आणि सगळे आजूबाजूचे लोक खदखदा हसायला लागले. मी अगदी बुचकळ्यातच पडलो. हास्याचा खोकाट थांबल्यावर तात्यासाहेब म्हणाले, "अहो त्याचे नाव गॉल्ट नसून गो आहे." `मी गॉल्ट नसून गो` असे तो सांगत होता तुम्हाला. "जा पुन्हा त्याच्याकडे मी सांगतो सारे समजावून फोनवर त्याला."
इलेक्ट्रिकल इंजिनिअर टु गवर्नमेण्टच्या हापिसात असताना असाच एक प्रकार घडला. जस्टिस McLeod यांच्याकडे त्यांच्या मलबार हिलवरील बंगल्याच्या इलेक्ट्रिफिकेशनचे प्लॅन्स घेऊन जाण्याचा योग आला. सकाळची वेळ. जस्टिस साहेब बागेत खुरपणी करीत होते. गुड मॉर्निंग जस्टिस मॅकलिओड एवढा शब्द तोंडातून बाहेर पडताच. म्हातारा माझ्याकडे टक लावून पहातच बसला. नंतर म्हणाला, "मक्लाऊ, नॉट (तोंड वेडेवाकडे करीत) मॅकूक्लिओऽऽऽड." मी उच्चार लगेच सुधारला नि क्षमा मागितली.
त्याच इलेक्ट्रिकल इंजिनिअरच्या हापिसात HIGHAM नावाचा एक गोरा असिस्टण्ट इंजिनिअर म्हणून आला. त्याच्या पहिल्या मुलाखतीत आम्ही त्याला हिघॅम् म्हणून गुड मॉर्निंग ठोकले. तो जरा समंजस होता. माय नेम इज हायम्, नॉट हिघॅम्. BROUGHAM नावाचाही उच्चार बरीच मंडळी बॉम असा करतात नि लिहितात, पण तो उच्चार आहे फक्त ब्रूम.
प्रकरण ९
स्कूल ऑफ मॉडर्न लँग्वेजीसचा थाट
नवा प्रिंसिपल माँशियर डेरोश हा फ्रेंच भाषातज्ञ तर होताच. पण नामांकित चित्रकारही होता. केव्हाही पहा, कामाचे तास संपल्यावर तो सारखा पाणरंगाची चित्रे काढीत बसलेला आढळायचा. शाळेच्या सगळया भिंती त्याने आपल्या सृष्टीसौंदर्य दर्शक चित्रांनी भूषविल्या होत्या. माणूस मोठा हौशी अत्यंत टापटिपीचा, मोकळ्या मनाचा आणि सौंदर्यप्रेमी प्रत्येक भाषेच्या क्लासला एक अपटुडेट शृंगारलेली प्रशस्त खोली. प्रत्येक वेळी एकच विद्यार्थी. नि एकच प्रोफेसर एक टेबल नि दोनच खुर्च्या, पायाखाली गालिचा पसरलेला. माथ्यावर बिजली पंखा.
विद्यार्थी तरी कोण? मोठमोठे परदेशी व्यापारी जर्मन नि फ्रेंच शिकण्यासाठी जपानी बॅन्कांचे जपानी अधिकारी नि त्यांच्या स्त्रिया यांची गर्दी विशेष इंग्लिशच्या क्लासात तीच अवस्था, मराठीसाठी सेक्रेटरिएटमधील आय. सी. एस. झालेले, पण मराठीचा विशेष अभ्यास करणे प्राप्त असलेले अधिकारी, पोलीस खात्यातले सार्जण्ट्स आणि काही जपानी व्यापारी. या मंडळींना बर्लिट्झ मेथडने (संभाषण- प्रात्यक्षिक पद्धतीने) मी मराठी भाषा शिकवीत असे. ही मेथड इंग्रेजी शिकवण्यासाठी मिस ब्लण्डेल वापरीत असे. ती मी अभ्यासून त्यावर मराठीचा स्वतंत्र कोर्स तयार केला. दररोज दहा ते अकरा आणि अकरा ते बारा असे दोन वर्ग मला घ्यावे लागत असत. ते झाले की कमर्शल एजन्सीच्या इतर कामासाठी कचेरीत हजर व्हायचे. कधीमधी जवळच असलेल्या रिपेरिंग वर्कशॉपमध्ये, आमचा प्रोफेसरी नेकटायकालरचा जामानिमा उतरून, कमरेला अप्रॉनचे मळके फडके गुंडाळून, इतर कामगारांबरोबर तासभर काम करायचे.
सर रॉबर्ट डंकन बेल......माझे विद्यार्थी
मराठीच्या वर्गात पाचपन्नास अनेक भाषीय मंडळी आली नि गेली. महिना दोन महिने कामचलाऊ बोलण्याइतके शिकायचे नि जायचे. पण सेक्रेटरियटमधील (त्याकाळचे असिस्टंट सेक्रेटरी) रॉबर्ट डंकन बेल हे माझ्यापाशी मराठीचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी चिकाटीने नि निष्ठेने सतत चार-पाच वर्षे नियमित धडे घेत असत. मराठी लेखन, वाचन आणि संभाषण यांत त्यांनी उत्कृष्ट प्राविण्य मिळवले होते. कित्येक युरोपियन आय. सी. एस. मंडळी मराठीत कमी मार्क मिळालेले असल्यामुळे, त्यांना येथे आल्यावर मराठी भाषा प्राविण्याचे कोणातरी मराठी पंडिताचे सर्टिफिकीट मिळवावे लागत असे. ते मिळाले म्हणजे त्यांची जिल्हयात कलेक्टर म्हणून तात्काळ नेमणूक होत असे. किंवा तशी नेमणूक झाल्यावरही सर्टिफिकीटासाठी उगाच नामधारी अभ्यास करून सर्टिफिकीट मिळवावे लागे. अशी मंडळी माझ्या वर्गात चार-पाच होती. पण मला तसे सर्टिफिकीट देण्याचा अधिकार असावा, म्हणून बेलसाहेबाने सरकारकडे माझी शिफारस करून पंडित पणाचा दाखला मिळवून दिला. मग हो काय? पंधरा-वीस दिवस क्लासात यायचे, थातरमातर शिकायचे नि सर्टिफिकीट घेऊन पसार व्हायचे. पण बेलसाहेबाचा खाक्या न्यारा. मला केसरीचा लेख घड़घडा वाचता येऊन, त्याचे भाषांतर करता येईतोवर आणि मराठीचा हवा तो ग्रंथ मराठी माणसांप्रमाणे वाचता येईतोवर मी तुमच्यापाशी शिकत राहणार असा त्याचा निश्चय होता. ज्या लेखावरून टिळकांना हदपारीची शिक्षा झाली, त्याबाबतची बेलसाहेबाची प्रतिक्रिया पुढे येईलच.
श्रीमंत सकल गुणालंकरण
सदा हसतमुख आणि तशात मराठी बोलणारा गोरा साहेब म्हणजे जेथे जाईल तेथे सगळ्यांचा आवडता. या गुणांमुळे बेलसाहेबाच्या ओळखी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हयांतल्या पाटील शेतकऱ्यांपर्यंत झालेल्या. त्या खेडुतांनी कधीमधी बेलला पत्रे लिहिली की तो त्यांना आपल्या वळणदार मोडी अक्षरांनी उत्तरांची पत्रे लिहीत असे. पत्रांची सुरवात (व्यक्ती लहानमोठी हा कसलाच विचार न करता) श्रीमंत सकल गुणालंकरण या मायऱ्याने तो करीत असे. एकदा उत्तराचे लिहिलेले पत्र त्याने मला दाखवायला आणले. मला काही हसू आवरेना. म्हटले. सगळ्यांनाच असा मायना लिहीत नाहीत. मग कसा लिहावा? रा. रा. म्हणजे राजमान्य राजेश्री असा फार तर लिहावा. (कारण त्याकाळी श्रीयुत शब्द चलनी झालेला नव्हता.)
`बायांनो आणि बुवांनो…`
झटपट भाषांतर करण्याचा एक तास असे. त्या दिवशी हव्या त्या विषयावर मी इंग्रेजीत बोलायचे आणि बेलसाहेबाने त्याचे झटपट मराठी करून बोलायचे अशी पद्धत होती. एक दिवस व्याख्यान म्हणून लेडीज अॅण्ड जण्टलमेन` अशी मी सुरवात करताच, बेल क्षणभर गोंधळला. पण लगेच बायांनो आणि बुवांनो असे भाषांतर करून मोकळा झाला. मला हसू आवरेना. "व्हाय व्हाय? इझीट रांग?" त्याने विचारले. "आम्ही मऱ्हाठे व्याख्यानांची सुरवात `लेडीज अॅण्ड जण्टलमेन` मायऱ्याने करीत नाही. `भगिनी बांधव हो किंवा मित्र हो` अशा थाटात करतो." पण हीसुद्धा इंग्रेजीची गावठी नक्कल म्हटली तरी चालेल. खरं म्हटलं तर भाषणाला एकदमच सुरवात करण्याची प्रथा आहे.
भाज्यांना इंग्रजी शब्द कोणते? याविषयी आमची एकदा चर्चा झाली. "पडवळाला स्नेक व्हेजिटेबल काय म्हणता तुम्ही लोक, माणसं काय साप खातात?"
बेल: मग लेडीज फिंगर या भाजीला तुम्ही काय म्हणता?
मी : काय? बायकांची बोटे भाजीला नाव? कोणती भाजी बुवा ती?
बेल : थांबा. उद्या मी आमच्या खानसाम्याला विचारून येतो.
भाजीचे त्याने सांगितलेले नाव घोकीत बेल क्लासमध्ये प्रवेशला. गुड मॉर्निंगच्या ऐवजी एकदम तो म्हणाला, "दॅटीज मेंढ्याची भाजी."
"मेंढ्याची? छे छे, ती भेंड्याची भाजी असावी मी खुलासा केला" नि आमचा अभ्यास चालू झाला.
`हे ब्रिटिश लोक पक्के हरामखोर`
केसरीतील ज्या लेखावरून टिळकांना हदपारीची शिक्षा झाली. ते सारे अंक गोळा करुन मी बेलसाहेबाला वाचायला दिले. एक आठवड्यानंतर तो ते परत घेऊन आला.
मी : काय? वाचले सारे अग्रलेख?
बेल : होय, फारच उत्तम आहेत. सरकारला पुढच्या धोक्याबद्दल दिलेल्या सूचना वाजवी आहेत.
मी : मग सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा देण्याइतके त्यांत काय भयंकर आढळले तुम्हाला?
बेल : हे पहा मिस्टर ठाकरे, हे ब्रिटिश लोक पक्के हरामखोर आहेत. (मग बेल कोण? ही शंका माझ्या मनात घुटमळली) मी आहे स्कॉच, आम्हा स्कॉच लोकांचा त्यांनी आजवर काय थोडाथोडका छळ केलेला आहे? नव्हे. आजही करीतच असतात. आमच्या सेण्ट अॅण्ड्रयुज डेच्या दिवशी आम्ही प्रार्थना करतो, सहभोजन करतो, त्याचीसुद्धा हे लोक मनस्वी टवाळी करतात. आम्ही त्यांच्या मुली करीत नाही नि त्यांना आमच्या देत नाही. स्कॉटलंडला स्वतंत्र करण्यासाठी आमच्याकडे पण एक शिवाजी होऊन गेला. विल्यम वॉलेस तुमचा शिवाजी विजयी झाला, आमचा मारला गेला. या लोकांनीच मारला. पण त्याने दिलेला जबरदस्त तडाखा या ब्रिटिशांच्या काळजात सारखा टुपत असतो.
मी : येथील सर्विसमध्ये मग तुमचे कसे काय जुगते पटते?
बेल : न जुगायला काय झालं? आयरीश लोकही आहेतच ना, नोकरीपुरते काम बाकी कोणाची मने स्वच्छू नसतात. टिळकांना अडकवून टाकायचे, एवढे ठरल्यावर, न्याय मनसुबा हवाच कशाला? ब्रिटिशांची न्याय-नीती ही अशी आहे. तुम्हाला चौबळची हकिकत माहीत आहे का नाही?
मी : हं हं. सर चौबळ त्यांनी काय केले?
बेल : (हा मजकूर त्यांनी इंग्रजीत सांगितला) ज्या रात्री आठ वाजता दावरने टिळकांना शिक्षा ठोठावली. त्याच रात्री गवर्नमेण्ट हाऊसवर मोठा खाना झाला. मी गेलो होतो. सर चौबळ टेबलावर आले तेच अगदी घुश्श्यात गवर्नर सर जार्ज क्लार्क येताच आम्ही सगळ्यांनी, रीतीप्रमाणे, त्यांना खडी ताजीम दिली. पण चौबळ बसूनच राहिले. उठले नाहीत. नामदारांनी हाऊ डू यू डू सर भास्कर असे विचारताच स्वारी ताडकन उठली. "रात्री आठआठ वाजेतोवर हायकोर्ट चालवता, हे काय अॅडमिनिस्ट्रेशन झाले? शरम वाटायला हवी होती तुम्हा लोकांना अरे, टिळकांना शिक्षाच द्यायची होती. तर हायकोर्टाच्या नेहमीच्या वेळात दिवसाउजेडी द्यायची होती. सूर्यास्त होऊन काळोखात कशाला? कॉवर्डस्. मला नेमायचा होता जज्ज. कसलीही सुनावणी न करता पाठवला असता अंदमानला. जजमेंटमध्ये सरळ लिहिले असते, आमच्या सरकारची अशी पॉलिसी आहे म्हणून"
गवर्नर : टिळकांची न सरसाहेबांची बरीच दोस्ती होती म्हणायची?
चौबळ : दोस्ती? जिवस्य कण्ठस्य. त्याच्या केसरीच्या पहिल्या जाहिरातीवर माझी सही आहे महाराज. अगदी पहिल्या अंकापासून तो कालच्या अंकापर्यंत केसरी मी वाचीत आलेलो आहे. आक्षेप घेतलेल्या लेखांत कसला रे आलाय राजद्रोह? राजद्रोह सिद्ध करण्याची तरी अक्कल आहे का तुमच्या लोकांना? बेशरम!
बेल : हे सारे बोलत असताना, सर चौबळ धडाधड टेबलावर रागारागाने बुक्क्या मारीत होते. टेबलावरची सारी काचेची भांडी त्यांनी फोडून टाकली आणि संतापाच्या भरात घरी निघून गेले. गवर्नरच्या तोंडावर अशी खरडपट्टी काढणारा मला एकच सर चौबळ दिसला.
मी: अहो, मऱ्हाठा ना तो
बैल: सर्टनली. असले धाडस तुम्हा मराठ्यांना शिवाजीनेच शिकवले आहे. नाही का? या दिवसाचा क्लास असाच राजकारणाच्या चर्चेत खर्ची पडला.
फक्त नाताळच्या दिवशी स्मरण ठेवा
बेलसाहेब हा लंडन येथील सुप्रसिद्ध ग्रंथप्रकाशक बेल अॅण्ड कंपनीच्या मालकाचा मुलगा. नोकरीत वाढत वाढत तो अखेर चीफ सेक्रेटरी झाला आणि सन १९३५ मध्ये काही महिने अॅक्टिंग गवर्नर होता. याच सुमाराला मी भिवंडी येथे अत्यवस्थ आजारी पडलो आणि एका मध्यरात्री मला तेथून किंग एडवर्ड हॉस्पिटलात आणण्यात आले. जीवराज मेहता हे डीन होते. सकाळी बहुतेक मराठी पत्रांत आणि टाईम्स ऑफ इंडियात मला केइएम मध्ये आणल्याची बातमी प्रसिद्ध झाली. ती वाचताच जीवराज मेहतांना पहिलाच फोन आला तो अॅक्टिंग गवर्नर सर रॉबर्ट डंकन बेलचा. दुसरा डॉक्टर आंबेडकरांचा आणि तिसरा लगोलग इलेक्ट्रिकल इंजिनियर टु गवर्नमेंटचा. अनेक वेळा "तुमच्यासाठी मी काय करू" असे बेल मला वरचेवर विचारीत असे. "आपण फक्त नाताळच्या दिवशी क्रिस्मस कार्ड पाठवून मला आठवीत जा. यापेक्षा अधिक काही नको." असे मी सांगत किंवा कळवीत असे. माझी प्रसिद्ध झालेली एकूणेक पुस्तके बेलच्या संग्रही असत. सेवानिवृत्त होऊन स्वदेशी परत जाईतोवर त्याचा माझा स्नेहसंबंध अखंड होता. सहा वर्षे मराठीचे त्याने माझ्याजवळ अध्ययन केले.
गुड मॉर्निंग मिस्टर मेकॅनिक
कमर्शल एजन्सीच्या रिपेर वर्कशॉपमध्ये कॉक्स अॅण्ड कं. चा रोनियो कॉपियर आला होता. त्याची सुरी पाजळायची होती. मी ती पाजळली आणि कॉक्समध्ये जाऊन ती नीट बसवून द्यायला मला वाझसाहेबाने (मॅनेजरने) सांगितले. लांडी पॅण्ट, वर मळका अॅप्रॉन, हाफशर्ट अशा थाटात सुरी घेऊन मी कॉक्समध्ये गेलो. समोर पहातो तो बेलसाहेब त्या बँकेत आलेला. मला पाहताच, हॅल्लो मिस्टर मेकॅनिक, व्हॉट ब्रिंग्ज यू हिअर? मी सर्व सांगितले.
बेल : सो. यू अॅप्रिशिएट डिग्निटी ऑफ लेबर दॅटस् फाईन, क्रेडिटेबल.
यंत्रावर सुरी बसवून ती चालवून दाखवीपर्यंत कॉक्सच्या इतर साहेबांबरोबर बेल माझ्या पाठीशी उभाच होता. त्याने त्यांना मी कोण आहे. याची माहिती देताच, त्या सर्वानी शेकहॅण्डसाठी हात पुढे केले. पण मी कसा करणार? माझे हात माखलेले. मी नुसते नमस्कार केले.
एकसुरी जीवनाचा वखवखाट
सन १९१० ते १९१४ च्या आगष्टपर्यंतचा मुंबईकरांच्या जीवनाचा काळ अगदी एकसुरी बनला होता. स्वदेशी आणि बहिष्काराच्या आंदोलनाने लोकमत इंग्रेजांविरुद्ध कितीही खवळलेले झालेले असले, तरी सर्वसामान्य माणसाच्या जीवनात कसलाही काही बदल नव्हता. तीच नोकरी, त्याच सांजसकाळच्या आगगाड्या, तेच न तेच ठराविक गाडी-दोस्त, तीच हाटेले नि तेच टिफिनचे पदार्थ. बाहेर ब्रिटिशांविषयी तळतळाट, पण रोज हापिसात त्याच गोऱ्यांपुढे यस्सर यस्सर करणारे आम्हीच. नोकरमाऱ्या लोकांची ही अवस्था होती; तरीही नोकरीच्या फंदात न पडता, स्वतंत्र काहीतरी हुन्नरीचा उद्योग करून इभ्रतीने पोट भरणाऱ्या लोकांची संख्याही काही कमी नव्हती.
एम्पायर बिल्डिंगजवळच्या फूटपाथवर एक मुसलमान दर शुक्रवारी सकाळी बसलेला असायचा. जवळ एक पाणरंगाची पेटी, ब्रश आणि टीनच्या छोट्या डबड्यात पाणी. बसायला गोणपाटाचे एक पटकूर. एवढीच त्याची इस्टेट, आजूबाजूला लोकांची वर्दळ केवढीही असो, तो आपल्या मांडीवरील स्केचबुकावर काढीत असलेल्या चित्राच्या रंगवणीत गढलेला. समोरून जवळून कोणी का जाईना, नुसती मान वर करूनही तो बघायचा नाही. आठवडयातून एकच दिवस फक्त शुक्रवारी तो दिसायचा. एरवी केव्हाही नव्हे. मी एक दिवस त्याला हटकले. "क्यौ, जनाब, दर शुक्रवारी इथे बसून काय उद्योग करता?"
तो : पोटाचा. दुसरा कोण कशाला करील?
मी : मला चित्रकलेचा नाद आहे. म्हणून म्हटले, चौकशी करावी.
तो : (स्केच दाखवीत) जर्मनीमध्ये धारवाडी लुगडी नि खण तयार करण्याचा कारखाना आहे. काठाचे रंग कसे भरतात. आडवा उभा धागा कसा असतो. हे मी स्केच काढून त्यांना दर मेलला पुरवीत असतो. त्याबद्दल मला दर स्केचला रु. पंच्याहत्तर मिळतात. बस्स झाले तीनशे रुपये पोटाला.
मी : ही चित्रे काय तुम्ही आठवड्याच्या विलायती टपालाने पाठवतो?
तो: छे छे. ते पलीकडे कॉफीवाल्याचे दुकान आहेना, तेथेच एक जर्मन इसम छोटया दुकानात बसतो. त्याला स्केच दिले का लगेच तो रोख रुपये देतो. तो टॉपिकल फोटोही विकत घेतो.
आजही एम्पायर बिल्डिंगच्या पोर्चमधून आपण जाऊ लागलो का एका ठिकाणी कॉफी भाजण्याचा सुवास दरवळत असतो. त्याच ठिकाणी बाथरूमएवढ्या छोट्या जागेच्या दुकानात तो लठ्ठंभारती जर्मन खुर्चीवर बसलेला असायचा. दुकानात टॉपिकल फोटोची जर्मनीत छापलेली रंगीत पोस्टकार्ड आकर्षक रीतीने टांगलेली असत. ते दुकान दुरून त्याने मला दाखवले. मी तेथे गेलो नि गुड मॉर्निंग ठोकला.
जर्मन : फोतो पोस्तकार्य...... वॉन्त? वेरी चीप दझान वन रूपी यू फोटोग्राफर? बिंग फोतो. वी बाय, फिफ्तीन रुपी कॅश.
त्याला इंग्लिश समजे, पण फारसे बोलता येत नसे. बरीच कार्ड पाहिल्यावर माझ्या डोक्यात एक कल्पना चमकली. आपण जर पोस्टकार्ड फोटोचा व्यवसाय केला, तर दर आठवड्याला या ठिकाणी किमान १५ ते ३० रुपये जोडप्राप्ती होण्याचा संभव आहे. कल्पना आली का तिचा पिच्छा पुरवायचा, हा माझा स्वभावधर्मच आहे. तसाच गेलो एस. महादेव अॅण्ड सन्सच्या दुकानी. तेथे माझं दादरचे शेजारी आणि रोज रात्री माझ्या खोलीतल्या संगीत मैफलीतले गायक कै. बाळकृष्ण नानाजी कोपर्डे ऊर्फ कोपर्डेबुवा यांना भेटून कल्पना सांगितली. त्यांनी लगेच एक पोस्टकार्ड कॅमेरा मला वापरायला दिला. त्यात आठ चित्रांची फिल्म असायची. "तुम्ही सध्या शॉट्स घ्या नि मी प्रती तुम्हाला देतो. चांगले विषय निवडलेत नि फोटोही चांगले आले. तर छान आहे की ही लाइन." कोपर्डेबुवांनी उत्तेजन दिले. दादरला कीर वाडीत कुरतडकर रहात असत. तेही आमच्या रोजच्या संगीत मैफलीचे मेंबर होते. त्यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय होता. शिवाय नोकरीही असे. त्यांनी मला डेवलपिंग, टोनिंग, प्रिंटिंग वगैरे सारे शास्त्र शिकविले. घरचे साहित्यही आणून पुरविले.
मी फोटोग्राफर बनतो
शंकर सीताराम ऊर्फ बाबुराव बेंद्रे हे माझे अक्षरश जानी दोस्त. कुठेही जायचे, काहीही करायचे असो, ते सारखे माझ्याबरोबर सावलीसारखे असायचे, यात कॅमेराचा पट्टा अडकवून दर शनिवारी आमची हापिसे सुटली की आम्ही मुंबईभर भटकायला सुरवात केली. इतर नोकरमाने शनिवारी चार-पाच वाजता घरोघर यायचे, पण आम्ही? सात-आठ वाजता या आमच्या भटकंतीला शेजाऱ्यानी च्युतीया चक्कर असे टिंगल-नाम ठेवले होते पहिल्याच आठवडयात मी आठ फोटो घेतले आणि त्याच्या प्रती घेऊन त्या जर्मनाकडे गेलो.
जर्मन : (एकेक फोटो पहात) नो, गुद.... यास्स... नो गुद, असे करीत करीत लेकाच्याने पाच फोटो पसंत केले `गिव निगेतिव.....
मी दिल्या. नंतर पसंत केलेल्या फोटोच्या मागल्या बाजूस त्याने भला मोठा रबरी शिक्का मारला.
"साईन… ऑल राइत रिझर्व्ह अवर कंपनी" असे म्हणून त्याने लगेच पंच्याहत्तर रुपये माझ्या हातावर ठेवले. भलतेच उत्तेजन मिळाल्यामुळे हा व्यवसाय मी पुढे बराच वाढवला इतकेच काय, पण ज्या ज्या वेळी मी नोकऱ्यांवर लाथ मारून बाहेर पडत असे, त्या त्या वेळी ही कला कामधेनूसारखी माझ्या मदतीला धाऊन येत असे. त्यावेळी कोपर्डेबुवांची मदत मला हुकमी लाभत असे.
कुठेतरी लढाई व्हायला पाहिजे बुवा!
नोकरमाने म्हणा किंवा स्वतंत्र हुन्नरी म्हणा, पण लोकांच्या जीवनात एकठशी एकरंगी एकसुरीपणा फार आला होता, जो तो म्हणे कुठेतरी लढाई होईल तर बरे. कुठेतरी म्हणजे हिंदुस्थानात नव्हे हं. तिकडे युरपात आणि तीही इंग्रेजांविरुद्ध असे जो तो बडबडत असे. पण येथे काय किंवा दूर युरपात काय कोणाची ना कोणाची इंग्रेजांशी लढाई जुंपलीच, तर तुम्हा आम्हाला फायदा काय? याचा फारसा विचारच कोणी करी ना. या इंग्रेजांना एकदा कोणीतरी शेरास सव्वाशेर भेटला पाहिजे, एवढीच ज्याची त्याची भावना फार लेकाचे मस्तावले आहेत. काय म्हणे, रुल ब्रिटानिया रूल, ब्रिटानिया रुल्स द वेझ, ब्रिटन्स नेव्हर शॅल बी स्लेझ लढाईचा घी देखा, पण बडगा नाही दिसला कोणाला? इंग्रेजांवर एखाद्या जबरदस्त युरोपियन राष्ट्राने चढाई केली रे केली, का हिंदुस्तान चटकन स्वतंत्र होणार, इतपतच बहुतेकांचे जागतिक राजकारणाचे ज्ञान.
अखेर नवसाला म्हसोबा पावला
युरपात ऑस्ट्रियन राजपुत्राचा खून झाला (सन १९१४) आणि जर्मनीच्या कायझरने तडाड इंग्लंडविरुद्ध युद्धाची चूड पेटवली. बस बस बस अभि बडी मजा आयेगी, चांगले भुसकट पाडील तो कायझर आता इंग्लंडचे! एकठशी जीवनाला वैतागलेल्या युद्धेच्छु मुमुक्षूंना परमानंद झाला. पण लवकरच भलताच मोक्ष समोर उभा ठाकला.
जर्मनांना पकडले
या घटनेच्या आधी काही महिने तात्यासाहेबांच्या शिफारशीने मी श्रोडर स्मिड्थ जर्मन कंपनीत सेल्समन म्हणून लागलो होतो. पगार रु. १२५. आपल्या हिंदी नोकरांना वागविण्याची जर्मनांची पद्धत नि शिस्त फार वाखाणण्यासारखी. तात्काळ ते आपल्याविषयी जिव्हाळा निर्माण करायचे. घरच्यापेक्षा हापिसचे जीवन आकर्षक वाटायचे. जर्मन राष्ट्राने इंग्लंडविरूद्ध सरकारची साहजिकच वक्रदृष्टी जर्मन कंपन्या, बँका नि जर्मन लोक यांवरच वळविली. युद्धाचा पुकारा कानी पडताच श्रोडर स्मिड्थ कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हा सर्वत्रांना एकत्र बोलावले, "बॉइज, परिस्थिती अचानक बदलली एकदोन दिवसांतच आम्ही सारे गिरफ्दार होणार.
आमचा सर्व व्यापार, मालमिळकत जप्त होणार. तुम्ही सर्वांनी आम्हाला फार फार सहकार दिला. आता आपण दुरावणार कदाचित कायमचे. फार दुःख होत आहे आम्हाला. तुम्ही सारे बेकार होणार. सहा सहा महिन्यांचे पगार आम्ही सगळ्या लहानमोठ्या तुम्हा सहकाऱ्यांना आज देत आहोत. तो घ्या नि आम्हाला निरोप द्या. मॅनेजरचे हे भाषण चालू असता, आम्ही सारे स्फुंदत होतो. आम्ही बाहेर पडलो मात्र आणि एकदम पोलिसांची धाड आली आणि पुढचे सर्व विधी आमच्या नजरेसमोर घडले.
इंग्रज, स्कॉच, आयरिश नि फ्रेंच सोडून बाकीच्या सर्व युरोपियनांच्या बिऱ्हाडावर धाडी घालून पोलिसांनी त्यांची बायकामुले लॉऱ्यांत भरूनच तेथे आणली नि ते आमचा निरोप घेऊन आत बसले. लगेच त्यांना बोरीबंदरवर उभ्या असलेल्या खास आगगाड्यांत बसवून अहमदनगरला रवाना करण्यात आले.
काय हो, आता काय करायचे?
आमचे हजारो लढाई हवी बुवा म्हणणारे मऱ्हाठी वीरपीर बेकार बनून कपाळाला हात लावून बसले. रोजच्या रोज त्रिकाळ युद्धाच्या बातम्या देणाऱ्या इंग्रेजी वृत्तपत्रांच्या पोटी मात्र शनी आला. मला सहा महिन्यांचा पगार मिळाला होता. पण बाकीच्या इतर शेकडो, हजारो नोकरमान्यांना तोही लाभ झाला नाही. सकाळ गेली. संध्याकाळची वाट काय, अशा कठोर अडचणीत ते सापडले. निराळी काही हालचाल करावी. तर कारकुनी खर्डेघाशीपेक्षा दुसरे हुन्नर ठावे नाही. शिलकी गोऱ्यांच्या कंपन्यांत सोय पहावी तर तेथलेच लोक ते कमी करू लागले. फक्त सरकारी हापिसातले लोक काय ते नशिबवान ठरले. त्यांच्या जागा मात्र गोकर्ण महाबळेश्वर लिंगम्! बेकारांच्या टोळ्यांच्या टोळचा रोजगारासाठी भटकंती करू लागल्या. हाहाकार उडाला!
जपान्यांनी हात धुऊन घेतले
पहिल्या युरपियन महायुद्धात जपान जर्मनीला मिळाला नव्हता. तो तटस्थ होता. जर्मनादी प्रतिस्पर्धी व्यापाऱ्यांचे हिंदुस्थानातून तळपट उडाल्यावर, येथील व्यापारी क्षेत्रात जपानला दाही दिशा मोकळ्या झाल्या आणि त्याने मनमुराद लूट केली. त्यावेळी म. गांधींचे खादीचे पिसाट बरेच बोकाळले होते. बेझवाडा येथील खादी भाण्डाराला म. गांधीनी समक्ष भेट देऊन, तेथल्या खादीची खास स्वदेशी म्हणून मनसोक्त स्तुती केली. हिंदुस्थानभर बेझवाडा खादीचा फैलाव झाला. अखेर ते बेण्ड फुटले, तेथल्या खादीधारी काँग्रेसभक्तांनी जपानशी संगनमत करून, जपानी खादीची सणगेच्या सणगे `स्वदेशी` खास हिंदुस्थानमा बनेला माल म्हणून विकण्याचा तडाखा चालू केल्याचे बिंग बाहेर येताच, आपण दिलेल्या सर्टिफिकीटाचा म. गांधींना मनस्वी पश्चाताप झाला आणि मी ही दुसरी हिमालयाएवढी घोडचूक केली. असे जाहीर खेदोद्गार त्यांनी काढले.
चरख्यांच्या बाबतीतही जपानने अशीच घालमेल केली. लक्षावधी रुपयांचे लाकडी चरखे. बेधडक `स्वदेशी` नावाखाली विकले गेले. त्यांनी घालमेल केली नाही, असा एकही व्यापार उरला नव्हता. ब्रिटिश सरकारला तरी विरोध करण्याचे कारण काय? तटस्थ म्हणजे दोस्तच, तो स्वदेशीवाल्याच्या नखऱ्यात गरममसाला घालीत असेल, तर त्यात त्यांचे काय बिघडणार होते?
किंचित संसाराकडे वळतो
कारण, त्याच पार्श्वभूमीवर या बाह्य जगातल्या अडीअडचणींना मी कसा तोंड देऊ शकलो. याचे चित्र नीट रेखाटता येईल. तसे म्हटले तर सौभाग्यवती मूळची खेडेवजा गावची परतवाड्याची शिक्षण व्हपा पास. रहाणी जुन्या वळणाची वाहन म्हणजे घोड्याचा टांगा, यापेक्षा अधिक माहिती नाही. लग्नासाठी परतवाड्याहून घोडयाच्या टांग्यातून अमरावतीला आल्यावरच आगगाडीचे दर्शन झाले. मुंबईला (दादरला) आल्यावर येथली ती रोजची घनचक्कर हातघाईची रहाणी पाहून बिचारी काही दिवस बावरलीच होती. सकाळी वर्तमानपत्रांचा ढिगारा दुधाच्या उकाड्यासारखा येतो काय, घरातले सारे, चहा प्यायचे विसरून, त्यावर तुटून पडतात काय, काही तिला उमगेच ना.
पण थोड्याच दिवसांत तो गावठी नूर विरघळत गेला आणि चार-सहा महिन्यांतच सौ. रमा अगदी अपटुडेट बनली. तरीही आजूबाजूचे वातावरण. आजच्यासारखे मनसोक्त नसे. नवराबायको एकत्र रस्त्याने चालू शकत नसत. मग फिरायला जाण्याचे नावच कशाला? आणि त्यावेळी दादर-माहीम विभागात फिरायला जाण्याची सोय तरी होती कुठे? दादरची चौपाटी हा अगदी अलिकडचा अवतार आहे. त्याकाळी आमची नि दादर चौपाटीची भेट फक्त मुडदेफराशीच्या प्रसंगी व्हायची. तिकडे एरवी कुत्रसुद्धा फिरकत नसे. गणपती बुडवायचे तेही माहीम लेडी जमशेटजी रस्त्यावर असलेल्या दोन तळयात त्यातल्या त्यात माटुंग्याच्या देवळाला लागूनच असलेल्या तलावात. हे तळे मात्र छान असायचे. चारी बाजूनी चौफेर चिरेबंदी पायऱ्या आणि स्वच्छ पाणी. त्या जागेवर आज मार्केट थाटलेले आहे.
आई आजी हयात असल्यामुळे, त्यांनी लौकरच सौ. ला संसारकर्तव्यात चाणाक्ष बनविली. तीही लवकरच वर्तमानपत्रांच्या व्यसनात दंग होऊ लागली. चर्चाचिकित्सा शंकाकुशंका यांवर वाद करू लागली. दिवसभर मुंबईला व्यवसायाची दगदग, महिन्याला रोख पगार हाती पडायचा. घरातला देण्याघेण्याचा सारा व्यवहार ती जातीने पाहू लागली. बाजारातला कोणताही जिन्नस आणण्याची माझ्यावर कधी वेळच आली नाही. त्यामुळे आजही कोथिंबिरीपासून तो तांदळापर्यंत, कशाचा किती भाव, नि बरे वाईट कोणते, या ज्ञानात मी अगदी अक्षरशः ढच आहे. अमक्याचा भाव वाढला नि तमक्याचा घसरला. कसे काय दिवस जाणार बुवा, या विषयावर कोणी चर्चा करू लागले का आजही मी नुसता हुंहूं करीत नाईलाजाने ऐकत बसतो झाले.
त्यातले अवाक्षरही मला समजत नाही नि उमजतही नाही. सारांश, सौ. ने मला त्या संसारी जंजाळात कधी पडूच दिले नाही. माझ्या दैनंदिन गरजा काय, याचा तिने चोख आढावा घेतल्यामुळे, बाह्य जगाच्या दलामलीत मला यथेच्छ भाग घेता आला. मुलेबाळे झाल्यावरही संसाराच्या कसल्याही विवंचना तिने माझ्यापर्यंत येऊ दिल्या नाहीत. फक्त दर महिन्याच्या पहिल्या तारखेला आम्ही रोख खंडणी भरली की राज्याचा बंदोबस्त कसा काय आहे? विचारण्याची जरूरच पडायची नाही.
अस्पृश्यता-छे, वाईटच!
तरीही अस्पृश्यतेबाबत हिचे मत काय असावे, याचा मला अंदाज घेण्याचा योगच येईना. एका शनिवारी तो आला. हापिसातून परत येत असता, कोटातले माझे स्नेही श्री. सदोबा काजरोळकर माझ्या बरोबर घरी आले. कोणी पूर्व अपरिचित घरी आला का चहा-चिवडा-भजी तयार करणे, हे ठरलेलेच असायचे. त्याप्रमाणे पहा-भजी फराळाला आली. बशाही तिने उचलून आत नेल्या. काजरोळकर निरोप घेऊन गेल्यावर मी विचारले- "आता आला होता हा गृहस्थ कोण, माहीत आहे काय?"
ती : कोणी का असेना महार मांग, आपल्याला काय करायचे?
मी : हे चांभार जातीचे
ती : इतक्या स्वच्छतेने वागणारे नि सभ्यपणाने वागणारे कोणी का असत ना, आपल्या घरी स्वागत झालेच पाहिजे. त्यात कसला आलाय विटाळ नि चंडाळ, घाणेरड्या कपड्यात एखादा ब्राह्मण आला तर मात्र त्याला थारा देता कामा नये.
मी : मग हे सारे लोक, केवळ महार, मांग, चांभार जातीवरून...
ती : त्यांना अस्पृश्य मानतात. हा तुमच्याच भाषेत सांगायचं तर गाढवपणा आहे.
बस्स! त्या दिवशी मी जिंकली. त्यानंतर अस्पृश्योद्धाराच्या ज्या ज्या आंदोलनात मी आणि बेंद्रे भाग घेत असू, त्यात सौ. चा भरभक्कम पुरस्कार आम्हाला लागत असे.
काय हो, नोकरी गेली. पुढं काय?
श्रोडर स्मिड्थ कंपनीची नोकरी सुटल्याचे मागे सांगितले आहे. मी काय केवळ कारकून होतो थोडाच सहा महिन्यांचा जादा पगार हातात पडला होता खरा, पण महागाईही वाढत चालली होती. आणि सहा महिन्यांत शिल्लक संपल्यावर पुढे काय?
आजवर मी अनेक क्षेत्रांत नोकऱ्या केल्या. पण स्वाभिमानाला किंचितसा ढका बसताच ताडकन सोडल्या. बेकारीची क्षिती मला कधीच वाटली नाही. अंगात हुन्नर असेल तो असामी कधीच रिकामा रहायचा नाही. नोकरी जाताच मी लगेच फोटोग्राफी, फोटो एन्लार्जिंग, ऑईल कलर पोर्ट्रेट पेंटिंगचा व्यवसाय घरी बसल्या चालू केला. ओळखीपाळखीने गिऱ्हाईक गाठण्यात सुरवातीला जी भटकंती झाली असेल तेवढीच. पुढे एकाकडचे काम पाहून दुसरा, तिसरा घरी चालत यायचा. अगदी सव्वाशे जरी कधी मिळाले नाहीत, तरी ७५-१०० पर्यंत उधराणी झाली, तरी चूल अडत नसे. होय उधराणी! स्वतंत्र व्यवसायांत ही एक नेहमीची धोंड असते. ५०-७५ रुपयाचे काम अगदी मुदतीत करून दिले. तरी पैसे मात्र खेटे घातल्याखेरीज वसूल व्हायचेच नाहीत, असा आमचा देशी खाक्या.
या व्यवसायाच्या जोडीलाच (१) बर्लिट्झ मेथडने चार महिन्यांत इंग्रेजी लिहिणे बोलणे आणि (२) एक महिन्यात स्लोन डुप्लोयन फोनोग्राफी शिकविण्याचा क्लास मी चालू केला. त्यावर दरमहा पोटापुरती प्राप्ती होत गेली. लेडी जमशेटजी रोडवरून सोराब मिल लेनच्या तोंडालाच (हल्ली मिरांडाची चाळ आहे तेथे) एक जुनी पाच-सहा खोल्यांची चाळ रिकामी होती. ती आम्ही दरमहा १० रु. भाडयाने क्लाससाठी घेतली. तेथेच बेंद्रे यांनी आपला होमिओपथिक दवाखानाही चालू केला या वेळी महालक्ष्मी येथे प्रॅक्टिस करणारे डॉ. बागवे यांच्या बरोबर बेंद्रयानेही होमिओपथीचा अभ्यास करून, दोघांनीही अलाहाबाद येथे जाऊन परीक्षा दिल्या सारांश, नोकरी गेली तरी रोजगाराचा ओघ काही थांबला नाही. ओळखीचे कोणी बेकार कारकून भेटले नि त्यांनी विचारले, "का. कसं काय चाललं आहे बुवा तुझं?" तर मी ठणकावून उत्तर देत असे, "अरे हजामाचा खुंट बदलला म्हणून काय झालं? कुठल्याही नाक्यावर उभं राहिल का गिऱ्हाईक हाक मारतंच."
दॅट् बास इज ए डॉन्की
टाईम्समध्ये एक छोटी जाहिरात पाहिली, शॉर्टहॅण्ड टायपिस्ट पाहिजे. मी अर्ज लिहीत असताना शेजारचा रामस्वामी म्हणाला, "कशाला या फंदात पडतोस? वेंट् बॉस इजे डॉन्की. ए मॉन्स्टर!" कारण तो आणि इतर दोघेचीधे मद्रासी तेथे लागले होते, पण दोनतीन दिवसांतच गेटावे डॅम्फूल झाले होते. म्हणून त्याने मला हा इषारा दिला होता. मला कॉल आला. मी गेलो. पीडब्ल्यूडी इलेक्ट्रिकल इंजिनिअर विल्यम स्टुअर्ट मेण्टि याने मला डिक्टेशन घातले. कारकुनी दालनात एका कोपऱ्यात असलेल्या टाइपरायटरच्या टेबलावर हवालदाराने आणून बसवले. मी कागद घातला आणि टायपिंग करतो तो काय? सारी रिवन जागोजाग फाटलेली, टाइप घाणीने भरलेले, अशाने काम कसे होणार? मी टाचणी मागून घेतली.
सारे टाइप क्लिअर केले आणि टाइपलेला कागद घेऊन साहेबाकडे गेलो. तो कसला वस्ताद नोट्स घेऊन गेल्यापासून तो मी परत येईपर्यंत चांगला अर्धा तास झाला होता. "काय या सहासात ओळी टाइप करायला तुला अर्धा तास लागला?" असे त्याने विचारताच, "साहेब, येथला टाइपरायटर अगदी भिकार अवस्थेत आहे. रिबन फाटलेली, टाइप सारे भरलेले. त्यावरचे टायपिंग (पहिला कागद दाखवून) हे असे भिकार येत होते. म्हणून मी सारे यंत्र स्वच्छ केले नि हा कागद आणला आहे. पहा."
त्याने टायपिंग बिनचूक नि स्वच्छ पहाताच माझी नेमणूक केली. इतकेच नव्हे, तर थोड्या वेळाने येऊन मी यंत्र आणखी स्वच्छ करून, रिबन बसवीत असताना त्याने नवीन टाइपरायटर मागविला आहे, असे मला सांगितले. याच कचेरीत माझी दहा वर्षे नोकरी होऊन, अखेर मी तेथे रेकॉर्ड सेक्शनचा हेडक्लार्क झालो.
नोकरी सांभाळूनही माझे वर सांगितलेले हरहुन्नरी व्यवसाय चालूच होते.
`शांबरिक खरोलिका`
दादर मूळचे एक ताडमाडांच्या भरगच्च रायांत बसलेले सुंदर खेडेवजा गावच होते. सन १९०९-१० पासून तेथे आमच्यासारखे बाहेरचे रोजगारी वसाहतीला जसजसे येऊ लागले, तसतशा ठिकठिकाणी नवनव्या चाळी उठत गेल्या. रोजगारीची दिवसाची दलामल केल्यावर रात्री करमणुकीचे साधन काहीच नव्हते. त्यामुळे कधीकाळी पटवर्धन ब्रदर्स यांचा `शांबरिक खरोलिका` सारखा खेळ बरोबर तंबू घेऊन फिरतीला आला तर त्याला चांगली किफायत होत असे. `शांबरिक खरोलिका` या विचित्र नावाबद्दल एकदा आम्ही खुद्द त्या पटवर्धनालाच विचारले. तो होता अस्सल नाकीं बोलणारा कोकण्या. त्याने खुलासा केला की, "अहो, शांबरिक म्हणजे मॅजिक आणि खरोलिका म्हणजे लॅण्टर्न, मॅजि म्हणजे आपला शंबरासूर, त्यावरून शाबरिक असा शब्द आम्ही बनवला. लॅण्टर्न ला मराठीत आपण दिवा दीप म्हणतो. पण हे शब्द फारजण वापरतात. म्हणून अमरकोशातून आम्ही `खरोलिका` काढली. विंग्रेजी शब्द हवेतच कशाला आपल्याला?"
मी : हा तुमचा भाषाभिमान ठीक आहे हो पटवर्धन मग तो ब्रदर्स शब्द तरी कशाला शिल्लक ठेवला?
तो : अरेच्या, हे बरीक खरे हो. पण आता नाइलाज आहे. तो शब्द आता पेटण्ट झाला ना? पेटण्ट शब्द ऐकताच हास्याच्या फुसकल्यात वाद संपला.
आजूबाजूच्या आम्ही काही मंडळींनी रोज रात्री तास दीडतासभर संगीत बैठकीचा उपक्रम नियमित चालू केला. कोपर्डेबुवा तंबोऱ्यावर भजनापासून क्लासिकलपर्यंत गाणारे गवई. बाबूराव बेंद्रे तबल्यावर माझी सतारीची साथ आणि कीरवाडीतले कुडतरकर आणि एक भजनी बुवा. असा दहाबारा मित्रमंडळींचा मेळावा माझ्या खोलीत जमायचा. इतरत्र उगाच एखाद्या बाडीत ग्रामोफोन आला तर ऐकू यायचा भजने मात्र वाड्यावाड्यांतून गुरुवार शनिवारचा मुहूर्त साधायची. बाकी सगळीकडे निहूप!
माझी मिरांडा चाळीतील खोली म्हणजे सार्वजनिक आणि जागतिक भानगडींच्या चर्चेचे एक ठराविक ठिकाण बनली होती. तशात युरपात पहिले महायुद्ध चालू झालेले. मनाची शांती बिघडविणाऱ्या अनेक बातम्या तासातासाला येऊन धडकायच्या. सरकारचा रंगरूट मिळविण्याचा धडाका सर्वत्र चालू होता. अनेक थरांतील लोक सकाळ संध्याकाळ कशाची ना कशाची चौकशी करायला नेमके आमच्या अड्डयावर टिपली यायचे. याच वेळी मला एक...
निस्पृह, करारी नि सच्चा समाजसेवक तरुण
भेटला. त्याचे नाव श्री. विष्णू विठ्ठल ओक, दादरचे विख्यात नेत्रवैद्य डॉ. एस. व्ही. ओक यांचे वडील बंधू त्यावेळी तो सतरा-अठरा वयाचा असेल. पुरा परिचय होण्यापूर्वी कदाचित तो आमच्या दैनिक चर्चामंडळाच्या बैठकांना येत असावा. एका दिवशी सकाळी ओक आला. मी मॅट्रिक परीक्षा पास झालो आहे आणि पुढे मला बी.ए. व्हायचे आहे. तुमचे सहाय्य पाहिजे. मी चाटच पडलो. सहाय्य म्हणजे काय? काही कल्पनाच होईना. पण तो तरुण बराच स्पष्टवक्ता दिसला. "बी.ए. होऊन तरी तू काय करणार?" मी विचारले.
ओक : "बी. ए. झाल्यावर दाखवीन. आज काय सांगणार? पण बी.ए. व्हायची माझी कणखर इच्छा आहे. मला पैशाची जरूर नाही. नुसता एक शब्द. तुम्ही तो दिलाच पाहिजे." त्याचा हुरूप, चेहऱ्यावरचा निर्धार पहाताच हा सर्वसाधारणांपैकी नव्हे, अशी तेव्हाच खात्री पटली.
ओक : हे पहा, सेण्ट झेवियर कॉलेजात तीन फ्रीशिपा आहेत. मी एकीसाठी अर्ज केला आहे. फादर गुडिअरची नि तुमची जानी दोस्ती आहे, असे मला कळले आहे. त्यांना आपण शिफारशीची चिठ्ठी दिलीत तर माझं काम होणार आहे.
मी : अगदी जानी दोस्ती नव्हे, पण तो मला मानतो.
ओकाला मी चिठ्ठी दिली. माणूस असा तडफडीचा, का तो लगेच ती घेऊन फादर गुडिअरला भेटला. त्याने सांगितले की, "अमुक तारखेला इंटरव्यूसाठी तीन अर्जदारांना बरोबर सकाळी दहा वाजता बोलावले आहे. तूही ये. जर त्यावेळी त्यातला एखादा एक मिनिटही लेट आला, तर ती फ्रीशिप मी तुला देईन." ओक बिनचूक वेळेच्या आधीच गेला. मिनिटाची जुगारच होती ती. एक उमेदवार गाडी लेट झाल्यामुळे, पाच मिनिटे उशीरा आला नि ओकान शर्यत जिंकली! सेण्ट झेविअर कालेजात ओक दाखल झाला. पुस्तकांची मिळवणी अशाच पद्धतीने त्याने कोठूनतरी केली. तेव्हापासून ओकाचा नि माझा निकटचा नि जिव्हाळ्याचा ऋणानुबंध जुळला कोठे काहीही करायचे तरी आधी माझा सल्ला विचारल्याशिवाय तो पुढे पाऊल टाकायचा नाही.
अल्पवयातच आई-वडलांचा मृत्यू झाल्यामुळे. स्वावलंबनाचे तत्त्व त्याच्या प्रकृतीत रसरसलेले होते. जे काही करीन ते स्वतः जातीने आणि म्हणाल त्यावेळी रातबेरातीची पर्वा नाही. नेसूचे एक धोतर, अंगात एक सदरा आणि डोक्यावर कशीबशी ठेवलेली दहाबारा आण्याची टोपी. बस्स. तो नुसता विद्यार्थी नव्हता. कट्टर देशाभिमानी समाजनिरीक्षक होता. कोठेही अन्याय जुलूम दिसला का ओक एकदम भडकायचा. त्याचा फडशा पाडण्यासाठी उपाय शोधायचा आणि मी हे असे करणार, "तुमचं म्हणण काय आहे?" हे बेधडक विचारायचा दिलेला अभिप्राय त्याला पटला नाही तर मुकाट जायचा आणि काम केल्यावर उल्हासाने अहवाल द्यायचा.
ज्या दादर इंग्लिश स्कूलमधून तो मॅट्रिक झाला. त्याच शाळेत त्याने शिक्षकाची नोकरी मिळविली. शाळेचे प्रिंसिपल बाबा कोल्हटकर, ओक मास्तर वगैरेचा त्याच्यावर फार लोभ, पण कोणापाशीही कसलीही याचना तो करीत नसे. शिक्षकाची नोकरी सांभाळून तो कॉलेजच्या टर्म्स भरीत असे. उरलेला सारा वेळ सार्वजनिक भानगडी, अन्याय, जबरदस्तीच्या घटनांचा बिनचूक तपशील गोळा करून, "बोला, हे आपण असेच चालू द्यायचे काय?" असा सरळ सवाल माझ्यापुढे टाकायचा आणि त्या भानगडींच्या निवारणाचा मार्ग सुचवून, लगेच त्या कामाला लागायचा. त्यावेळी लादीवाल्यांच्या वाडीत एका इमारतीतल्या लहानशा खोलीत स्वतःच जेवणखाण करून रहायचा. जेवण तरी कसले? भात शिजवायचा नि आणा अर्धा आण्याचे दही आणून जेवायचा. चहासुद्धा घ्यायचा नाही. तो फक्त आमच्याकडे दिला तरच प्यायचा. एखाद्या भानगडीच्या मागावर गेला का रिपोर्ट द्यायला मध्यरात्रीसुद्धा धापा टाकीत येऊन भेटायचा.
रंगरूट भरतीचे तमाशे
पहिल्या महायुद्धात हिंदुस्थानने वॉर फण्ड आणि रंगरूट भरतीचे सहकार्य ब्रिटिशांना द्यावे. असा लो. टिळकांनीच पुकारा केल्यामुळे, त्या दिशेने सरकारलाही मोठे अवसान आले. रंगरूटभरतीसाठी तगडे जवान शोधून, त्यांना मथवायचा धंदा करणारे शेकडो लोक मुंबईच्या नाक्यानाक्यावर सकाळपासून टेहळणीवर असायचे. अंगात पांढरा शर्ट, खाकी लांडी विजार आणि हातात एक सहाफुटी लाठी घेऊन हे वीर सगळीकडे टेहळणी करीत फिरत असायचे. दादरला मारुतीजवळच्या (त्यावेळी मारुती मात्र तेथे नव्हता) पोलीस चौकीजवळ दोघेतिघे बसलेले असायचे. उंचापुरा नि तगडा दिसला का त्याला हाक मारून कोण? कुठले? काय करता? पगार किती? वगैरे चौकशा मोठ्या लाडीगोडीने करायचे.
तसाच कोणी जाळ्यात आलाच तर त्याला जवळच्या हाटेलात नेऊन चहा पाजायचा, दुप्पट पगाराच्या नोकरीची लालूच दाखवायची आणि बोलत बोलत (हल्ली कीर्तिकर मार्केट आहे, त्या जागेवर उंच तटाची फेणीदारू-आंबलेल्या ताडीची दारू तयार करण्याची प्रशस्त डिस्टिलरी होती, तेथील) रिक्रुटिंग स्टेशनात नेऊन दडपायचा. एकदा तटाच्या आत गेला रे गेला का पहाटेला झालाच कुलाब्याच्या रंगरूट छावणीत जमा तेथे त्याला लष्करी युनिफॉर्म आणि न्याहारी जेवणाची लयलूट लाभायची. इतकी की समजा दोनप्रहरी त्याचा पत्ता काढीत नातलग चौकशीसाठी आले, तर तो घरी परतायला चक्क नकार द्यायचा. इतका तो भारून जायचा.
दादर त्यावेळी नुकतेच कुठे आपली खेडुती कात टाकून किंचितसे शहरीपणाचे कळसवणी चढवीत होते. एका संध्याकाळी कचेऱ्या गिरण्यातून घरी परतणारी अंदाजे पाचपंचवीस मंडळी वेळेवर घरी परत न आल्यामुळे एकच बोभाटा झाला. माझी जागा म्हणजे सार्वजनिक तक्रारीचे पोष्ट ऑफीस रात्री सातआठच्या सुमाराला काही बाया नि पुरुष माझ्याकडे वर्दी द्यायला आले. अशा कामाला आमचा सीआयडी म्हणजे ओक, त्याच्या खोलीवर पहातो तो दार बंद तसाच मी आणि बेन्द्रे माहीम पोलीस स्टेशनवर गेली. त्यावेळी वरळी ते माहीम या जी वॉर्डाला एकच माहीमचे पोलीस स्टेशन, बरोबर पाचसहा तक्रारी माणसेही होती तेथल्या गोऱ्या सुपरदंटाने अगदी निर्विकार चेहऱ्याने सांगितले, "एकदम एवढे लोक नाहीसे होतात. तर ते गेले असतील आपखुशीने सैन्य भरतीला आहे काय त्यात एवढे चिंता करण्यासारखे? आपल्या सरकारला नको का लोकांनी अशी मदत करायला? ते लोक आता कुठे आहेत, भेट होईल का. वगैरे प्रश्नाना प्रथम त्याने नकारच दाखवला. पण थोडा विचार करून म्हटले, "उद्या दहा वाजता तुम्ही कुलाब्याच्या रिक्रुटिंग कॅम्पकडे जाऊन चौकशी करा."
आम्ही सारे परतलो. रात्री बाराच्या सुमाराला ओक हातात कागदाचे भेंडोळे घेऊन आला. "दादा सगळीकडे कहर माजला आहे या रंगरूट भरतीचा. आपल्या दादरची वीसपंचवीस मंडळी नाहीशी झाली आहेत. मी त्यांच्या घरोघर जाऊन त्यांची नावे, नोकरीची ठिकाणे, वगैरे माहिती इत्यंभूत लिहून आणली आहे. संध्याकाळी सहा वाजल्यापासूनच या कामावर मी गेलो."
"काही खाल्लेपिल्ले की नाहीस?" मी विचारले.
ओक : असल्या प्रसंगी कसले खाणे नि कसले पिणे, सौ. ला उठवून चहा तयार केला. बेन्द्र्याला उठवले, चहा प्यालो.
ओक : आत्ताच्या आत्ता तयार करा एक रिपोर्ट असाच नेऊन देतो हॉर्निमनला बॉम्बे क्रॉनिकल मध्ये छापायला.
ओक खपाटीला बसला का काम करून घेतल्याशिवाय हालायचा नाही, हे मला माहीत होते. काढला टाइपरायटर आणि केला एक विस्तृत रिपोर्ट तयार. हातात पडताच ओक तीरासारखा निघाला. प्रथम दादर पोलीस चौकीवरून त्याने हॉर्निमनला फोन केला (त्यावेळी फोन करायला आत्ताच्यासारख्या दमड्या लागत नसत) की एक भयंकर सणसणाटी बातमी पुराव्यासह आताच घेऊन येत आहे. जागा राखून ठेवा.
`रेन ऑफ टेरर अॅट दादर`
दुसऱ्या दिवशी सकाळीच या ठळक मथळ्याने आमचा रिपोर्ट बॉम्बे क्रॉनिकलमध्ये भरगच्च दोन पाने भरून आला. पहाटे उठून पहिली कापी ओकाने पैदा करून काळया रुळातच तो धावत माझ्याकडे आला. "आला आला. दादा, आपला रिपोर्ट जशाच्या तसा क्रॉनिकलमध्ये आला. हा पहा." झोपाळू डोळयांनी मथळा वाचला, तोंड धुतले. चहापान झाल्यावर समग्र वाचला. मुंबईभर खळबळाट उडाला. कारण, हीच तऱ्हा सगळीकडे घडलेली होती. दुसऱ्याच दिवशी क्रॉनिकलादी सर्व प्रातः पत्रांत बातमी झळकली की क्रॉनिकलची ३० हजार रुपये सिक्युरिटी सरकारने जप्त केली.
मुंबईवर जर्मन एम्डेन पाणबुडी येणार!
पाचसहा दिवसांनीच माझ्या शेजारच्या एकूणेक मदासी मंडळीत रात्री गडबड उडाल्याचे मी पाहिले. चौकशी केली तेव्हा कळले की मद्रास बंदरावर जर्मनीच्या एम्डेन पाणबुडीने बॉम्बवर्षाव केला म्हणजे मौज पहा. सुमारे आठनऊ वाजता रात्रीच्या सुमाराला ती बॉम्बफेक होते नि दहा वाजता ती बातमी जागोजागच्या मद्रासी मंडळींत फैलावते कशी फैलावली असेल? कारण स्पष्ट होते. तारखात्यात बहुतेक यंडुगुंडुचा भरणा विशेष. तशात पाणबुडीचा बॉम्बवर्षाव त्यांच्या मायदेशावर झालेला. त्यांनी ताबडतोब साऱ्या हिंदुस्थानभर आपल्या जातभाईंना कडकडक करून ती बातमी दिली. आम्ही बोलत बसलो होतो तोच खास सरकारी कॉन्फिडेशल तारखात्यात काम करणारे मोघे नावाचे ओळखीचे एक गृहस्थ रातपाळी संपवून तुळशीदास चाळीत चालले होते मला पाहताच ते वर आले नि त्यांनीही या बातमीला खास दुजोरा दिला. इतकेच नव्हे तर बंदराचे नि शहराचे कोणकोणते भाग त्या हल्ल्यात जायबंदी झाले. त्याचीही तपशीलवार माहिती दिली.
पण दुसऱ्या दिवशी कोणत्याही वृत्तपत्रात त्या बातमीचा मागमूसही नव्हता. लोकांच्या तोडी मात्र बातमी सगळीकडे होती. समजा, मद्रास बंदरावर जर्मन पाणबुडीने आज हल्ला केला, उद्या मुंबईवरही तसाच होण्याचा संभव मग करायचे काय? गिरगाव चौपाटीची बाजू बहाड दर्याला मोकळी आहे. त्याच बाजूने हल्ला होण्याचा संभव मोठा म्हणून बिब्बी लाईनने रोज हापिसात नि कामावर जाणाऱ्या डेली पेंसिजरानी भराभर आपापले पास रद्द करून ज्यापी पास काढले. झालाच हल्ला तर गिरगाव सडकला जाईल. बोरीबंदरला धक्का लागणार नाही. हा त्यातला स्ट्रेटेजिकल पॉइण्ट आम्ही काही तसे केले नाही. पण ओकाची परीक्षा पहाण्यासाठी मी म्हटले, बघ रे ओक्या, बिबीने जाऊ नकोस.
तो : छट् आपण तर त्याच बाजूने जाणार येणार. हल्ला कसा आला याचे वर्णन तरी करता येईल. हल्ला झालाच तर प्रथम मलबार टोकावरच्या गवर्नमेंट हाऊसवरच होणार झालाच पाहिजे फार लेकाचे मस्तावले आहेत.
बरोबर पंधरा दिवसांनी सरकारी सेन्सॉरने एम्डेनच्या हल्ल्याची बातमी वृत्तपत्रांकडे पाठविली त्यावर लिहिताना हॉर्निमनने हँग द सेन्सॉर (फाशी द्या या सेन्सॉरला) या मथळ्याखाली एक स्फुट लिहिले. एम्डेनच्या हल्ल्यांची बातमी आमच्या कचेरीत साडेनऊ वाजता त्याच रात्री आमच्या बातमीदाराने धाडली होती. आम्ही सेन्सॉरकडे चौकशी केली तेव्हा त्या लेकाने कानावर हात ठेवले. आणि आता पंधरा दिवसांनी तीच बातमी सगळीकडे तोच पाठवतो. बेशरमपणालाही काही सीमा असतात. या पंधरवड्याच्या मुदतीत शेकडो मद्रासी मंडळीकडे त्यांच्या घराहून पत्रे येऊ लागली. त्यांत सारा तपशील कळविला होता.
कालिदासाच्या ऋतुसंहारावर ओकाचा हल्ला
त्यावेळी प्रीविअस (फर्स्ट इअर) च्या वर्गाला कालिदासाचे ऋतुसंहार हे काव्य अभ्यासाला ठेवलेले होते. गावकीच्या हजार भानगडींचा निचरा करीत होता, तरी ओकाचा कॉलेजचा अभ्यास अगदी काटेकोर तळमळीने चाललेला असायचा. एका रविवारी ऋतुसंहाराचे पुस्तक घेऊन स्वारी आली. "दादा, आज सुट्टी आहे. हे एवढे काव्य भाषांतरासहित मुद्दाम वाचा पाहू, काव्य कालिदासाचे आहे, वर्णन छानच आहे. पण तारुण्याने मुसमुसणारे आम्ही तरुणतरुणी वर्गात एकमेकाशेजारी बसलो असताना ही कामोद्दीपक वर्णने प्रोफेसरांनी आम्हांला घोळून सांगावी नि आम्ही ती ऐकावी किंवा वाचावी हे विद्यार्थ्यांच्या नि विद्यार्थिनीच्या भावनावश मनावर कसला परिणाम करू शकेल, नव्हे करीत आहे. याचा नको का कोणी विचार करायला? करिकुलमधून हे रद्द करून घेण्याचा माझा विचार आहे. तुमच काय मत आहे."
ऋतुसंहार मी वाचलेला होताच. ओकाचे म्हणणे मला पूर्ण पटले भावनावशतेच्या उंबरठ्यावर येत असलेल्या तरुणतरुणी ह्यातील वर्णनाने चित्तचंचल होण्याचा संभव बराच - माझा अभिप्राय ऐकताच खिशातून एक खर्डा माझ्यापुढे ठेवला हे मी एक पत्र तयार केले. आहे. नीट सुधारून द्या टाइप करून म्हणजे जातो घेऊन क्रॉनिकलकडे चारपाच महिने हा आस्ति नास्ति बाद क्रॉनिकलात रंगला. ओकाने एक लांबलचक पत्र युनिवर्सिटीच्या सिण्डिकेटलाही लिहिले. हे काव्य एका जर्मन पंडिताने सर्वश्रेष्ठ ठरविले असल्यामुळे, प्रीविअसला लावण्यात आले. आता परीक्षा दीडदोन महिन्यांवर आली आहे. सबबा आपल्या सूचनेचा सध्याच काही विचार करता येत नाही, याबद्दल दिलगीर आहो असे ओकाला उत्तर आले. एवढचाने तो स्वस्थ बसणार थोडाच? मला म्हणाला, "दादा, मला दहा रुपये देता का?" अखेरची गोळी झाडून पहातो एकदा ऋतुसंहारातील शेलक्या निवडक कवितांची भाषांतरे त्याने टाइप करून घेतली एक पत्रही घेतले. त्यात मजकूर "आपण कृपा करून या कविता आजच्या सिंडीकेटच्या भरसभेत मोठ्याने वाचून दाखविण्याची माझ्यावर कृपा करावी या मेहनतान्याबद्दल सोबत दहा रुपयाची करन्सी नोट मी जोडीत आहे. तिचा स्वीकार व्हावा."
निर्वाणीचे हे अस्त्र घेऊन ओक सिंडीकेटच्या सभेला गेला. सर नारायणराव चंदावरकर व्हाइस चॅन्सेलर होते. धिटाईने पुढे होऊन त्याने तो खलिता त्यांच्या हातात दिला त्यांनी पाहिला आणि म्हणाले, "धीट तरुणा, तुझे म्हणणे मला मान्य आहे. या कविता येथे वाचण्यात स्वारस्य नाही. पण पुढल्या वर्षापासून हे पुस्तक अभ्यासातून काढले जाईल, अशी मी तुला हमी देतो हे घे तुझे रुपये. तुझ्या विवंचनेबद्दल नि आजच्या धाडसाबद्दल मी तुला शाबासकी देतो. आम्हाला असल्याच नीतिनिष्ठ तरुणांची आवश्यकता आहे."
"दादा, अखेर शर्यत जिंकली. हे घ्या दहा रुपये परत." म्हणत ओक संध्याकाळी आला. आज तो अगदी हर्षातिशयाच्या माथ्यावर बसला होता. "द्या मला कप भरून चहा. सकाळपासून जेवलो नाही. याच कामामागे सारखा होतो."
मुकाटतोंडी समाजसेवा अशी
जरा कुठे काही इटुकली चळवळ केली. चारदोन व्याख्याने झोडली, मोर्चात मिरवले का समाजसेवेचा डांगोरा पिटून, स्वतः कोणी अहम् विशेष टेंभ्याने मिरवण्याची आजकाल फॅशनच झालेली आहे. सगळेच पुढारी आणि पाठचाले कोणीच नाही. आणि सध्याचा देखावा बनला आहे. पण विष्णू ओकाच्या काळात ही फॅशनच नव्हती आणि त्याकाळच्या आम्हा लोकांना "पी हळद हो गोरी धाटणीच्या पब्लिकशिट्टीचे व्यसनही ठावे नव्हते.
बिबी म्हणजे आजकालच्या वेस्टर्न रेल्वेवर विद्यार्थी वर्गाला कोणत्याही स्टेशनापर्यंत सवलतीचे डेली पॅसेंजर पास काढण्याची सवलत नव्हती हे आज कोणाला सांगितले तर खरे वाटणार नाही. अंधेरी वांद्रयाच्या विद्यार्थ्याला पास काढायचा असला, तर तो त्याला चर्चगेटच्या हापिसात जाऊनच काढावा लागत असे. या अन्यायाविरुद्ध ओकाने जबरदस्त हालचाल केली. `चळवळ` शब्द मी कटाक्षाने योजीत नाही. सार्वजनिक अन्यायाविरुद्ध स्वतः एकट्याला जेवढे काही निष्ठेने निर्धाराने करता येईल, तेवढे करायचे, अपयशाने गांगरून न जाता, यत्नांची शिकस्त करायची आणि यश मिळाल्यावर त्याचे मानसिक समाधान मानून स्वस्थ बसायचे, हीच त्याकाळची आणि अर्थात ओकाची प्रवृत्ती होती.
त्याने वृत्तपत्रांत त्या अन्यायाविरुद्ध ओरड केली. बिबीच्या अधिकाऱ्यांकडे अर्जाअर्जी आणि गाठीभेटीचे सत्र चालू केले आणि विद्यार्थ्यांना हव्या त्या स्टेशनावर हव्या त्या स्टेशनचा सवलतीचा विद्यार्थीपास मिळण्याची सोय अंमलात आणविली.
कुर्ला स्टेशनचा आयलंड फलाट
ज्यापी रेल्वेच्या चार लायनी नुकत्याच चालू झाल्या होत्या. त्यासाठी कुर्ल्याचा आयलंड फलाट तयार झाला. लोकांना बरे वाटले. पण त्यावर मुरुम माती किंवा लाद्या न घालता, गिरणीत जळालेल्या दगडी कोळशाचा कोक पसरला, त्यावरून चालणे एक दिव्यच होते. अनवाणी चालणारांच्या पायाच्या तळव्यांना भेगा पडायच्या. त्याकाळी महिला वर्ग सध्यासारखा सर्रास चप्पलधारी नसे. त्यामुळे त्यांची तर फारच अडचण व्हायची. ओक स्वतः कुर्ल्याचा प्रवासी. त्याने तात्काळ वृत्तपत्री हाकाटी चालू केली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. इतकेच काय पण. एका गोऱ्या हापसरला त्याने चॅलेंज दिले की. "तू तुझ्या पत्नीला एक वेळ त्या फलाटावरून अनवाणी चालून दाखव, म्हणजे लोकांच्या तक्रारीची नांगी तुला समजेल. ओकाच्या तक्रारीला कुर्ल्याला बऱ्याच लोकांनी पाठिंबा दिल्यामुळे, एक महिन्याच्या आत प्रथम कोक काढून मुरुम माती घालण्यात आली नि मग काही दिवसांनी लाद्या घालण्यात आल्या. या सगळ्या क्रांतीला (छे छे छे, फार सवंग झालेला अगडबंब शब्द आहे हा), सगळ्या बदलाला विष्णू ओकाचे श्रमसाहस कारण आहेत. हे कितीकांना आज माहीत असेल?
दादर स्टूडंट्स युनियन
दादर इंग्लिश स्कूलच्या काही आजी माजी विद्यार्थ्यांनी लोकसेवा करण्यासाठी हे युनियन चालू केले होते. (उरणचे) भार्गवराव कोर्लेकर, (वॉर्डन विमा कंपनीचे सेवानिवृत्त) बाबा देशमुख, शंकर गुप्ते, कद्रेकर, आणि विष्णू ओक (आज जितकी नावे आठवतात तेवढी) इत्यादी पाचपन्नास तरुण मंडळी लोकसेवेला सजलेली होती. मुंबईत मांडला तांदूळ आला. त्याचे पद्धतशीर वाटप करण्याचे कामः सन १९१८ च्या भयंकर इन्फ्लुएंझा साथीत गज्जरचे (सरकारमान्य आणि मोफत मिळणारे) इन्फ्लुएंझा मिश्चर घरोघर जाऊन रोग्यांना देणे; रोग्यांच्या शुश्रूषेसाठी जागरणे करणे वगैरे अनेक कार्यात, इतर सहकाऱ्यांबरोबर ओकाचीही रातदिन धडपड चाललेली असायची. या युनियनचा कारभारही जाहिरातबाजीच्या वळणाला चुकूनही न जाता, मुकाटतोंडी केवळ आत्मसमाधानासाठी लोकसेवा करण्याचाच असे.
प्रकरण १०
पुढचे शिक्षण फर्ग्युसनातच!
सेंट झेविअर कॉलेजात ओक प्रीव्हिअसची परीक्षा शेकडा ७० मार्क मिळवून पास झाला. फादर गुडीअर या पुढील अभ्यासाची सोय करणार होता, पण ओकाच्या डोक्याने पुण्याला फर्ग्युसन कॉलेजात जायचा हेका घरला, "मला फक्त तेथे फ्रीशिप मिळवून द्या, पुढचं सारं मी पाहून घेईन. आजच्या आज पुण्याला जाऊन काय ते ठरवून या." असा हट्टच धरून बसला. पुण्याला माझे एकच वजनदार स्नेही, ज्यांचा शब्द तेथे खाली पडायचाच नाही, असे श्री दत्त पोतदार त्यांनी माझी प्रो. (मागाहून गुरुदेव) आर. डी. रानडे याची भेट घडवून आणली. त्यांनी प्रिंसिपल रँग्लर परांजपे यांच्याकडे मला नेले. सर्व हकिकत ऐकून त्या मुलाला घेऊन तर या मग पहातो काय करता येईल ते ते म्हणाले.
दादरला घरी तार पाठवून ओकाला पुण्याला बोलावून घेतले. रँग्लरसाहेबांशी ओकाचे बोलणे होताच त्यानी त्याच्या मोफत शिक्षणाची सोय केली. शिक्षणाची सोय झाली, पण हा येथे रहाणार कोठे, जेवणाची व्यवस्था काय, वगैरे प्रश्नावर माझे मी सोडवीन हे ओकाचे निर्धाराचे उत्तर पण कसे? "फर्ग्युसनमध्ये सीकेपी विद्यार्थ्यासाठी होस्टेलचा एक ब्लाक आहे. तेथल्या विद्यार्थ्यांनी मला फक्त बाहेरच्या व्हरांड्यावर झोपण्याची सवलत द्यावी, म्हणजे माझे मी भागवून घेईन. संबंधित मंडळींना भेटून ती सोय लावली आणि मी दादरला परत आलो."
ओकाचे पुण्याचे जीवन
झोपण्याची सोय झाली. पण मम्मंची सोय काय? हा स्वावलंबी पठ्ठ्या दररोज सकाळी ज्ञानप्रकाशादी वर्तमानपत्रे बुधवारात विकायचा. आणि त्या विक्रीवर जे मिळे. त्यावर तो आपला गुजारा करीत असे. थोडयाच दिवसांत ओकाने आपल्या भोवती सहृदय मित्रांचा घोळका जमवला. एक दिवस स्वारी लकडी पुलावर पुराधी मौज पहात असताना, डोक्यावरची टोपी पाण्यात पडली. हा तसाच कॉलेजात वर्गाला बसला. प्रिं परांजपे वर्गावर येताच हू इज दॅट बेअर-हेडेड फेलो देअर? गरजले. त्यावेळी शाळाकॉलेजातले विद्यार्थी आताप्रमाणे उघड्या माथ्याने वर्गात बसत नसत ओकाने टोपी हरवल्याचे सांगताच, रँग्लरसाहेबाने खिशातून पैसे काढून "जा, आताच टोपी विकत घेऊन घाल. वर्गात असे बसता येणार नाही तुला" असे सांगितले.
ओक : "सर, मी आपला फार आभारी आहे. दोन-चार दिवसांत मी माझ्या श्रमाने पैसे कमवून टोपी अगत्य घेईन, तोवर कृपा करून असेच बसण्याची सवलत द्यावी, अशी हात जोडून प्रार्थना करतो", असल्या करड्या निर्धाराचे कितीसे विद्यार्थी आज आढळतील? ओक रोज चणे आणि गूळ खायचा आणि रविवारी एखाद्या खानावळीत पोटभर जेवायचा असल्या कडकडीत तपश्चर्येने त्याने बी. ए. पर्यंत फर्ग्युसनमध्ये अभ्यास करून तो पास झाला आणि दादरला परत आला. दादर इंग्लिश स्कूलच्या शिक्षक-विद्यार्थी मंडळींनी त्याचा अनौपचारिक सत्कार केला. औपचारिक सत्काराला त्याचा कडवा विरोध, प्रिं. कोल्हटकर यांनी त्याला शाळेत शिक्षकाची नोकरी दिली.
मी अमेरिकेला जाणार
एक दिवस मी त्याला म्हटले, "ओक्या. ग्रॅज्युएट झालास नि काय साधलेस? मास्तरकीच ना?"
ओक : छे. हे एक तात्पुरते साधन आहे. मी अमेरिकेला जाणार. "अमेरिकेला? तो कसा काय बुवा ?" " लवकरच समजेल. तुमचा टाइपरायटर तयार ठेवा, म्हणजे झाले."
रोजची मास्तरकी करीत असतानाच, ओक कसल्या तरी कामात धावपळ करीत होता. एक दिवस मुंबईमध्ये ज्या ज्या लहानमोठा चॅरिटेबल इन्स्टिट्यूट्स होत्या, त्यांच्या छापील अहवालांचे बाडच्या बाड घेऊन माझ्याकडे आला. आपली सारी शैक्षणिक तयारी, त्यासाठी केलेले परिश्रम इत्यादी समग्र मजकुराचा एक खर्डा करून, त्याची सर्क्युलरे तयार करायला मला सांगितले. रोनियो डुप्लिकेटरवर ती मी तयार करून त्याला दिली. स्वतः तो प्रत्येक इन्स्टिटयूटच्या नेत्यांना जाऊन भेटला. हे त्याचे प्रयत्न निदान चार-पाच महिने अखंड चालू होते.
अखेर एक दिवस ओक अगदी नाचतच आला. "दादा, वाडिया चॅरिटीने अमेरिकेला जाण्यापुरता फंड सँक्शन केला. हे त्यांचे पत्र."
ओकाला दुसरीकडूनही रकमा मिळत गेल्या. त्या तो कोल्हटकर मास्तरांकडे ठेवीत असे. त्यांतून त्याने काही कपडेही केले. असा तो अगदी खुषीत असतानाच. एक दिवस वज्राघात झाला.
वाडिया ट्रस्टने दिलेली देणगी एकाएकी माघारी घेतली. हे पत्र ज्यावेळी पोस्टमनने ओकाच्या हातात दिले, त्यावेळी एक ढोपर पंचा. एक सदरा आणि बोडका अशा अवस्थेत तो होता. ते पत्र घेऊन तसाच माझ्याकडे आला. "दादा, याच वाडिया ट्रस्टकडून रद्द केलेली ग्रँट परत मिळवीपर्यंत हा ओक याच वेषात रहाणार अशी त्याने गंभीरपणे प्रतिज्ञा केली. वाडियावर वजन आणण्यासाठी त्याने प्रयत्नांची कमाल केली. तीन-चार मॅनेजिंग कमिटीच्या बैठकीत जाऊन त्याने भाषणेही केली. वेष तोच, त्यावर एका सदस्याने विचारले असता, ओक ठणकावून म्हणाला, "ट्रस्टने एकदा दिलेले वचन पुरे करीतोवर हाच माझा वेष. पुरे केले नाही, तर हयातभर असाच रहाणार." अखेर ट्रस्टने मंजूर केलेल्या रकमेचा चेक घेऊन ओक परत आला. लगेच त्याने अमेरिकेला जाण्याची झटपट तयारी चालविली. पासपोर्ट आधीच काढला होता. ओक अमेरिकेला जाणार, ही आवई सर्वत्र गेली. जो तो आश्चर्य करू लागला. एका शुक्रवारी रात्री तो माझ्याबरोबर जेवला आणि आशीर्वाद घेऊन, दुसऱ्या दिवशी शनिवारी बोटीवर चढला, तीच त्याची नि आमची अखेरची भेट.
अमेरिकेला गेल्यावर त्याचे फक्त एकच पत्र मला आले. ते मी प्रबोधन पाक्षिकात छापले. बऱ्याच दिवसांनी माझे स्नेही कै. गोपाळराव चिपळूणकर हे स्वाध्यायाश्रमात वसतीला आले असताना, त्यांनी अमेरिकेत ओकाला भेटल्याची हकिकत सांगितली. "अहो ओक म्हणजे भडकता ज्वालामुखी आहे. हिंदुस्थान स्वतंत्र होण्यासाठी कसकसे खटाटोप केले पाहिजेत, त्याचे नकाशे, हल्ला करण्याचे मोके, वगैरे भानगडीत तो सारखा गढलेला असतो. भेटेल त्याला त्याने आखलेल्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या योजना तो अगदी उस्तळून सांगत असतो. मोठा हट्टी दिसला बुवा"
ओकाचा फोटोच कुणाजवळ नाही
या ओक-चरित्र कथनाबरोबर त्याचा फोटो मिळवून छापण्याची मी आणि त्याचे बंधू नेत्रवैद्य डॉ. एस. व्ही. ओक यांनी खूप खटपट केली त्याने तेथे एका अमेरिकन युवतीशी विवाह केला नि आज तो अमेरिकन नागरिक म्हणून तेथे असतो. सुमारे चार-पाच महिन्यांपूर्वी त्याचा अमेरिकेचा पत्ता मिळवून मी त्याला एक एअरमेल पत्र पाठविले होते, पण ते तपास लागत नाही शेऱ्याने परत आले. फोटो काढू द्यायला त्याचा कडवा विरोध असे. दादर इंग्लिश स्कूलमध्ये अनेक गॅदरिंगमध्ये तो पुढाकाराने खपायचा. पण फोटोची वेळ आली का निसटायचा. प्रसिद्धी पराड:मुख राहून, पडेल ते श्रमसाहस, अपेक्षा उपेक्षाचे आघात सहन करीत ध्येय गाठणारा एक हिंमती मऱ्हाठा तरुण म्हणून विष्णू ओक माझ्या हृदयात चिरंजीव झालेला आहे. त्याने मजविषयी जोपासलेल्या आदरपूर्ण स्नेहसंबंधाचा वारसा डॉ. एस. व्ही. ओक यांनी तसाच अविचल आजपर्यंत ठेवलेला आहे, हे काय कमी भाग्य होय?
मुंबईतील समाजसेवा केन्द्र
समाज-सुधारणेच्या किंचित एखाद्या विचारावर नुसते कोणी कुठे छोटेमोठे व्याख्यान दिले. का लगेच वर्तमानपत्रात त्याचा गाजावाजा करून स्वतःची जाहिरातबाजी गाजवून घेण्याचे आजकालचे फिसाट चालू शतकाच्या पहिल्या दोन शतकात तरी अवतरले नव्हते सुधारणेची कितीतरी क्षेत्रे पहाणाऱ्यांना जागोजाग पदोपदी दिसत होती. त्यांना एकट्या दुकट्याने हात घालणे, त्याकाळी काय किंवा आता काय, कठीण असते. संघशक्तीने कार्य करण्याची तळमळ पुष्कळ तरुणांना असायची. उदाहरणार्थ, शिमग्यात हमखास होणारे गावोगावचे गलिच्छ, बीभत्स आणि अश्लील प्रकार. सनातनी पिण्डाचे लोक त्यांकडे धार्मिक चष्म्यातून पहायचे, तर आधुनिक विद्येच्या संस्काराने विचार क्रांती झालेल्या नि होत असलेल्या नवतरुणांना त्या धांगडधिंग्याची किळस वाटायची. अनेक मऱ्हाठी गुजराथी मुंबईकर विचारवंत पुढारी या वार्षिक अवहेलनेच्या रूढीला आळा कसा घालावा, याचा विचार करीत असत.
सन १९११ साली काही नवविचारी तरुणांनी एकत्र येऊन, डॉ. सर भालचंद्र भाटवडेकर यांच्या नेतृत्वाखाली `होलिका संमेलन` मुंबईत ठिकठिकाणी साजरे करण्याचा पहिला धडाडीचा यत्न केला. गिरगावापेक्षा गिरणगाव विभागात या नव्या आंदोलनाचा उपक्रम सुरू झाला. शिमग्याच्या आठवड्यात निरनिराळ्या मोहोल्यांत कथा कीर्तने, व्याख्याने, नकला, छोटी नाटके, हिप्नॉटिझमचे प्रयोग, असे कार्यक्रम ठेवण्यात येत असत. रात्री आठ वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत, या होलिका संमेलनांचे प्रयोग व्हायचे. कार्यक्षेत्रच नव्हते, तोवर कोणाची कोणाला दाद नव्हती. पण आता ते निर्माण झाल्यावर अनेक कीर्तनकार, भजनी, मेळेवाले, नकलाकार इत्यादी आपण होऊन संमेलनाच्या कार्यक्रमात भाग घेऊ लागले. झाले, अशा शंभरदीडशे समाजसेवेच्छूचा एक संघ आपोआप तयार झाला.
दि. ११ मार्च १९११ रोजी या स्वयंसेवकांचे एक संमेलन न्या. नारायणराव चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले. वर्षाच्या काठी एकदाच होलिका संमेलनासाठी एकत्र येण्यापेक्षा, समाजसेवेच्या विशाल क्षेत्रातल्या निरनिराळ्या विभागांत काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी आपली एक कायमची संघटना बनवावी असा न्यायमूर्तीनी आदेश दिला आणि त्याच बैठकीत सोशल सर्विस लीग या संस्थेची स्थापना झाली. आंदोलनाचा श्रीगणेशा जरी शिमगारूढी प्रतिबंध या हिंदुसमाजविषयक कारणाने झाला, तरी लीग स्थापन होताच तिचे क्षेत्र भेदातीत म्हणजे हिंदुमुसलमानादी सर्व जमातींच्या व्यापाइतके वाढविण्यात आले. इतकेच नव्हे, तर वर्षाचे ३६५ दिवस केवळ समाजसेवेलाच वाहून घेऊन अनेक पदवीधर तरुणांनी लीगचे आजीव सभासद म्हणून स्वतःला वाहून घेतले.
लीगच्या कार्याचा विस्तृत व्याप
पांढरपेशा वर्गापेक्षा श्रमजीवी मागास वर्गालाच सेवेची आवश्यकता विशेष. त्यांच्यासाठी लीगने (१) मोफत फिरत्या लायब्रऱ्या, (२) रात्रीच्या मोफत शिक्षणाचे वर्ग, (३) पुस्तकांची व पैशाची मदत, (४) हॉस्पिटलातील आजारी माणसांना वाचनीय पुस्तकांचा पुरवठा, (५) समाजसुधारणेवर मॅजिक लॅटर्नची व्याख्याने, (६) अपघातांच्या प्रसंगी तात्कालिक मदतीची व्यवस्था, (७) रोग्याची घरगुती शुश्रूषा, (८) बालसंगोपनाचा वर्ग, (९) सेंट जॉन अॅम्ब्युलन्स ब्रिगेडमध्ये हिंदू स्वयंसेवकांच्या तुकडीचा भरणा, (१०) शारीरिक व्यायामाचे वर्ग, (११) पतपेढ्या, (१२) मोफत वाचनालये किती प्रकार सांगावे? आणि ही सारी सेवा मुकाटतोंडी मुंबईभर आजदिनतागायत अखंड चाललेली आहे. आजकालच्या राजकारणी धिबिडग्यात सोशल सर्विस लीगला काही भाव नसला तरी गिरणगावातील जनतेच्या आजच्या सर्वांगीण जागृतीचा पाया लीगनेच घातलेला आहे, हे नमूद करणे इतिहासाला भाग पडेल.
समाजकार्यातही जहाल मवाळ विकल्प
लीगचे अध्यक्ष सर नारायण चंदावरकर, उपाध्यक्षात सर जमशेटजी जिजीमाय, सर भालचंद्र भाटवडेकर, सर फजलमाय करिमभाय, यांसारखी मोठमोठी मंडळी. शिवाय मुंबईचे गव्हर्नर, आगाखान, दोराब आणि रतन टाटा, नरोत्तम मोरारजी गोकुळदास यांसारखी मंडळी लीगचे पेट्रन असल्यामुळे, सामाजिक सुधारणेला नाके मुरडून, फक्त राजकारणानेच चुटकीसरशी समाजोन्नती साधू पहाणाऱ्या जहाल पंथियांना लीग नि तिची विविध कार्ये किस चिडियाका नाम वाटणे साहजिकच होते. जहालांच्या वृत्तपत्रांत होलिका संमेलनादी कार्याची साधी बातमीसुद्धा कधी येत नसे. तरीही लीगचे काम मुकाटतोडी सारखे वाढतेच असायचे.
काही आजीव सभासद माझे स्नेही
शारदाश्रमवासी या टोपण नावाने साहित्यक्षेत्रात नामवंत झालेले प. वा. पुरुषोत्तम गोपाळ काणेकर यांचा नि माझा स्नेहसंबंध सन १९०८ सालीच झालेला होता. त्यांनी कामगार समाचार साप्ताहिकात कथालेखनाची संधी दिली, तेव्हापासूनचा. लीगचे ते आजीव सभासद झाल्यापासून तर हरएक समाजसेवेच्या कार्यात त्यांची हाक प्रथम येत असे. प. वा. बापुसाहेब सहस्रबुद्धे आणि अनंतराव चित्रे या स्नेहीजनांच्या बरोबर लीगच्या समाजकार्यात भाग घेण्याचे अनंत योग मला लाभले.
जुनीजुनी स्नेहीमंडळी आपल्या बरोबर हयात असणे आणि वरचेवर त्यांच्या गाठीभेटी होणे हे एक मोठे भाग्य म्हणावे लागते. लीगच्या आजीव सभासदांपैकी श्री. पुरुषोत्तम गोविंद नाईक या भाग्याच्या श्रेणीतले होत. सारी हयात समाजसेवेच्या विविध कार्यात तल्लीन एकनिष्ठेने व्यतीत करणारा नमुनेदार माणूस स्नेहधर्माला सच्चा नाइकांनी वेश्याव्यवसायाला आळा घालण्यासाठी बॉम्बे व्हिजीलन्स असोशिएशनचे एक कार्यकर्ते म्हणून तब्बल सहा वर्षे केलेल्या कामगिरीतली त्यांची धाडसाची कामे त्याच्या वेश्या आणि वेश्याव्यवसाय या नामांकित प्रथात नुसती वाचली तरी समाजसेवा म्हणजे केवळ व्याख्यानबाजीचे काम नसून त्यासाठी प्रसंगी कसकसल्या भयंकर संकटांनाही तोंड द्यावे लागते, याचा प्रत्यय येतो त्यांच्या `समाजसेवेची तत्त्वे` या ग्रंथाला महाराष्ट्र सरकारने पहिल्या क्रमांकाचे दोन हजार रुपयांचे बक्षीस दिले. ही एकच गोष्ट त्यांच्या कलमबहादरीची साक्ष पटविण्यास पुरेशी आहे.
लीगने समाजसेवेची संधी दिली
समाजसेवेच्छू अनेक मंडळीचा परिवार माझ्याभोवती आधीच जमा झालेला होता. कै. शंकर शीताराम ऊर्फ बाबूराव बेंद्रे आणि श्री. श्रीधर गणेश देवरुखकर हे दोघे कस्टम हापिसात नोकरीला असत. दोघेही पट्टीचे हिप्नॉटिस्ट याशिवाय त्यांच्यापाशी मोहविद्या शिकण्याच्या निमित्ताने आलेले अनेकजण माझ्या स्नेहपरिवारात होते. मुंबईत होलिका समेलनाची टूम निघताच आम्ही सारे त्या आवश्यक कार्याला सहकार देण्यासाठी धावलो. बेंद्रे देवरुखकरांचे हिप्नॉटिझमचे प्रयोग आणि माझी व्याख्याने शिमग्याच्या आठवड्यात आम्ही दहाबारा जण आमच्या कार्यक्रमानी गिरणगावभर ठिकठिकाणी होलिका समेलने गाजवायचे जाहीर व्याख्यानांचा यामुळे मला चांगला अनुभव घेता आला.
इंडियन ऑकल्ट इन्स्टिटयूट
बाबूराव बेंद्रे मूळचाच अध्यात्मवादी. हिप्नॉटिझमच्या व्यासंगाने तो त्या क्षेत्रात चांगलाच गुंतलेला असे. तो अध्यात्मवादी आणि मी? पक्का नास्तिक! पण ही प्रकृतिभिन्नता आमच्या स्नेहधर्मात कधीच आडवी आली नाही. श्रीधर गणेश देवरुखकर म्हणजे एक दुल्ला प्राणी. आजही सदा हसतमुख कर्ता समाजसुधारक, को-ऑपरेटिव खात्यात असिस्टंट रजिस्ट्रारच्या हुद्यापर्यंत जाऊन आज सेवानिवृत्तीच्या काळात कडकडीत सन्यस्तवृत्तीने रहात होते. तरुणपणापासूनच दाढीमिशा राखलेल्या. कस्टम हापिसात देवरुखकर कुठे आहेत? म्हणून चौकशीला जाणाऱ्यांना दाढीवाले देवरुखकर अशीच खूण पटवावी लागत असे. दैवज्ञ समाजाच्या जातिविरोधाला न जुमानता देवरुखकरांनी विधवेशी पुनर्विवाह केला. हल्ली यांचा मुक्काम कधी अलिबागेला तर कधी दादर शिवाजी पार्क येथे दररोज सकाळ संध्याकाळ भगवी वस्त्रे परिधान केलेले, हातात काठी, डोळ्यांनी दिसत नाही आणि कानांनी ऐकू येत नाही. अशाही अवस्थेत शिवाजी पार्कला प्रदक्षणा घालीत फिरणारे ते देवरुखकर केंद्रे आणि देवरुखकर यांनी दादरला इंडियन ऑकल्ट इन्स्टिट्यूट संस्था काढून अनेक विद्यार्थी मोहविद्येत प्रवीण केले. तेही त्यांच्याबरोबर ठिकठिकाणी प्रयोग करीत असत.
विशेषतः आजारी माणसावर प्रयोग करून त्याला आरोग्यदान करण्याची त्यांची हिकमत वाखाणण्यासारखी असे. याच नादातून पुढे बाबूराव बेंद्रे याने होमिओपॅथीची परीक्षा देऊन, रोगनिर्दाळणाचे अनेक महान चमत्कार केले. औषधांत डॉक्टर वैद्य जर आपली प्रबळ इच्छाशक्ती (विल पॉवर) निष्ठेने मिसळीत जातील, तर एकही रोगी दगावणार नाही असे तो म्हणत असे. प्लेगने पछाडलेला एक रोगी बेंद्रयाने रोज नुसते स्वच्छ पाण्याचे डोस देऊन, साफ बरा केल्याचे उदाहरण मी पाहिलेले आहे. "हिप्नॉटिझम नि मेस्मेरिझम म्हणजे काय लोकांपुढे माकडी चेष्टा करण्यासाठी नव्हत. लोकांची नि आपलीही दुःखे नष्ट करण्यासाठी त्यांचा उपयोग करण्यात खरा धर्म आहे." असे नेहमी तो निर्धाराने सांगायचा.
साधू गजाननराव वैद्य
नेहमीच्या सांसारिक जीवनात आयुष्याला सात्त्विक सोज्वळ वळण देणाऱ्या एखाद्या साधू पुरुषाची गाठभेट होणे, त्याच्या निकट सान्निध्याचा लाभ होणे, या परम भाग्याची संधी आद्य हिंदू मिशनरी गजाननराव वैद्य यांच्या अविस्मरणीय संगतीने मला लाभली. "चित्त गंगाजळ, वाणीचा रसाळ, त्याच्या गळा माळ, असो नसो." तंतोतंत या तुकोक्तिसारखे त्यांचे जीवन होते.
तसे म्हटले तर वैद्य बंधूंचा नि माझा परिचय फार जुना. सुंदरराव वैद्य नामांकित वुडकट एंग्रेव्हर आणि चित्रकार बॉक्सवुडवर कोरलेली शेकडो थोरथोर स्त्री-पुरुषांची त्यांची चित्रे `बालबोध` आणि केरळकोकीळ मासिकात प्रसिद्ध होत असत. ती कोरलेली चित्रे, आजही . पाहिली तर प्रत्यक्ष फोटोच वाटतात. निर्णयसागरचे नामांकित वुडकट एंग्रेव्हर `बीबी` यांच्या मागून वैद्य बंधूनीय या आकर्षक चित्रकलेची ध्वजा उंच सांभाळली होती. निर्णयसागरच्या चित्रांच्या कॅटलागात आजही वैद्यांची अनेक चित्रे जिज्ञासूंना पहायला मिळतील.
त्यांनी देवादिकांची आकर्षक चित्रे कार्डावर छापून ती विकण्याचा केलेला धंदा महाराष्ट्रात हा हा म्हणता लोकप्रिय झाला होता. पनवेलीस गुरुवर्य दादा आठल्ये यांच्या सहवासात असताना, मलाही वुडकट एंग्रेव्हिंगचा नाद लागला आणि त्या कामी कालबादेवी रोडवरील पी. पी. रेळे कंपनीचे पुंडलीकराव आणि त्यांचे बंधू यांनी त्या कलेतले प्राथमिक शिक्षण मला देऊन मनस्वी उत्तेजन दिले. वैद्य ब्रदर्सच्या कलापूर्ण छापखान्यात माझे जाणे येणे वरचेवर होत असे. त्यावेळी मला आठवते, तो प्रेस निर्णयसागरच्या जवळच कोलभाट लेनमध्ये होता.
हिंदू मिशनरी सोसायटीची कल्पना
क्रिस्ती मिशनऱ्यांचा त्याकाळी गिरगाव भागात मोठा जोर होता. त्यांची एक सार्वजनिक मोफत लायब्ररी पालव रोडवर होती. सर्व दैनिके, मासिके, परदेशी सचित्र वृत्तपत्रे आणि क्रिस्ती धर्माची लहानमोठी पुस्तके टेबलावर पसरलेली असायची. दररोज सकाळी अनेक वाचक मंडळींची तेथे गर्दी जमायची. पण या लायब्ररीचा एक लौकिक होता. नवथराला तो पहिल्याच प्रवेशाला अनुभवायला मिळायचा. बसण्याची सारी बाके, टेबले, खुर्च्या ढेकणांनी गजबजलेल्या असायच्या. नुसता त्यांना स्पर्श केला पुरे का चढलीच सारी ढेकूणसेना अंगावर. लागलाच तो बिचारा तेथेच नाचायला! म्हणून सर्व याचक टेबल बाकसेच काय, पण खिडक्यांनाही स्पर्श न करता, चक्क उभे राहूनच वाचनकर्म उरकायचे. बाटलेले अनेक विद्वान क्रिस्ती बॅकबेवर तंबू ठोकून, तेथे व्याख्याने, प्रवचने, गाणी यांचे मनोवेधक कार्यक्रम वरचेवर करायचे. सचित्र पुस्तके वाटायचे. गरजू बेकार कोणी आढळला तर त्याला नोकरीची म्हणा. छोकरीची म्हणा, लालूच दाखवून बिनबोभाट बाटवायचे. क्रिस्त्याप्रमाणेच इस्लामी मिशनऱ्यांचेही यत्न चाललेले असायचे, पण ते सारे बुरखेवाले असायचे. कोणाला थांगपत्ता लागायचा नाही.
बाटला तो आम्हाला मेला, यापेक्षा विशेष विवंचनेने हे चालले आहे तरी काय? लक्षावधी हिंदू परधर्मात या ना त्या मार्गाने खेचले जात असताना, कोणीच कसे या हिंदुसमाज-बल-विध्वंसाकडे लक्ष देत नाही? जो पहावा तो राजकारणात गढलेला! हिंदुस्थानात हिंदूच अल्पसंख्य जमात म्हणून जगण्याची अवस्था आली. तर राजकारणी खटाटोपानी मिळणाऱ्या स्वराज्यात इतरेजन सत्ताधारी होऊन आमच्यावर सत्ता गाजवणार काय? तशात किस्ती मिशनांचा जोर विलक्षण वाढता.
या गावी दुरवस्थेच्या पोटतिडिकेने उभ्या महाराष्ट्रात एकटे फक्त गजाननराव वैद्यच व्याकूळ झाले त्यांचा पिण्ड मुळी बंडखोरीचा खोटेनाटे दांभिक असे त्यांना काही सहन व्हायचे नाही. एरवी नवनीतासारखे मृदु असणारे गजाननराव अशा प्रसंगी वज्रापेक्षाही कठोर व्हायचे.
-हिंदूच्या लोकसंख्येला बिनअटकाव बिनप्रतिकार लागलेली ही गळती थांबवलीच पाहिजे. इतर कोणी हे कार्य करीत नसेल, तर मी स्वतः ते करणार वैद्यांचा हा निर्धार जाहीर होताच जी काही थोडी मंडळी त्यांच्या कार्यात मनोभावे सामील झाली, त्यांत मी आणि बेंद्रे सामील झालो. वैद्यबंधू मूळचे निष्ठावंत थिऑसॉफिस्ट, त्यामुळे एल. बी. ऊर्फ बाळासाहेब राजे, अनंतराव पिटकर (केसरीचे मुंबईचे बातमीदार अनंत) श्री. सावळाराम दौंडकर अशी पंधरावीस मंडळी त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून उभी राहिली. हिंदू मिशनरी सोसायटी स्थापन करण्याचे बातबेत चालू झाले गजाननरावांनी ठिकठिकाणी व्याख्याने देण्याचा सपाटा चालू केला. त्यावेळी गिरगाव हाच हिंदूचा जबरदस्त बालेकिल्ला होता, उत्तर मुंबई फारशी वर आलेली नव्हती, व्याख्यानाला गजाननराव उभे राहिले का प्रथम दर्शनीच ते आपल्या नितांत हिंदुत्व भक्तीचा आणि स्वतःच्या साधुत्वाचा ठसा श्रोत्यांवर बिनचूक उमटवीत असत. त्याचे सहज बोलणे हित-उपदेशच ठरत असे.
वैद्यांच्या योजनेवर वर्तमानपत्रांतून आस्तिनास्ति विचार व्यक्त होऊ लागले. बहुतेक सभा कावसजी पटेल टँकरोडवरील हिराबागेच्या प्रशस्त दिवाणखान्यातच होत असत. श्रोत्यांच्या शंका आक्षेपांना गजाननराव थोडक्यात समर्पक, विनयाने पण निर्धाराने उत्तरे द्यायचे, का तो तात्काळ सोसायटीचा मेंबर होऊनच परतायचा. क्रिस्ती मिशनरी केवळ मायावी आणि लाघवी, पण वैद्यांचा खाक्याच निराळा. "मी बोलतो ते निर्मल सत्य असेल, तुम्हाला तसे मनोमन पटत असेल, हिंदुत्वाविषयी तुम्हाला जातिवंत कळवळा असेल, तर या या माझ्या मागे हिंदुधर्माचा दरवाजा मी सताड उघडा करीत आहे. जगातल्या सर्व मानवांनी या धर्मक्षेत्रात यावे. आम्ही त्यांचे स्वागत करायला सिद्ध आहोत. काय म्हणता? हा अधिकार आम्हाला कोणी दिला? अधिकार देवाने दिला. हिंदुंचा वैदिक धर्म हा जगाचा धर्म झालाच पाहिजे, ही देवाची आज्ञा आहे."
होवो जगाचा गुरु आर्यधर्म
देवा जगी वाढवी हिंदु धर्म
लो. टिळकांनी कानांवर हात ठेवले
हिंदू मिशनरी सोसायटीची योजना निश्चित होताच, लोकमान्यांच्या कानांवर ती घालून, त्यांचा अभिप्राय काय, त्याचा अंदाज घेण्यासाठी, वैद्यांनी अनंतराव पिटकरांना पुण्यास धाडले. प्रश्न अक्षरशः अपूर्व अशा धर्मक्रांतीचा, पण वैद्य हे तर ब्राह्मणेतर, बामणेतर पंडिताने धर्माचे दरवाजे सगळ्यांना उघडे करायचे, बाटलेल्यांनाही परत हिंदू करून घ्यायचे, जगदगुरू शंकराचार्यांनाही धाब्यावर बसवून हा अधिकार मला देवाने दिला म्हणायचे या विलक्षण धर्मक्रांतीच्या योजनेला लोकमान्यांना होकार किंवा स्पष्ट नकार देण्याची शहामत झाली नाही. "आज काय सांगणार? प्रयोग करून पहा." असा संदिग्ध नि मोघम अभिप्राय टिळकांनी दिला.
करवीर पीठाचे पदच्युत शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी म्हणजे खरोखरच पंडिताग्रणी बहुश्रुत, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्वान, त्यांना सोसायटीची योजना कळविताच त्यांनी तात्काळ उत्तेजनपर संदेश पाठविला. पण नंतर सोसायटी स्थापन होऊन तिच्या कार्याचा तडाखा चालू होताच, त्यांनी विरोध केला. थोरामोठ्यांच्या बऱ्या वाईट अभिप्रायांनी हाय खाणारे ते थोडेच होते? त्यांचा आत्मविश्वास दांडगा
अखेर तो मंगल दिवस उजाडला
सन १९१८ सालच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता हिराबागेत गजाननराव वैद्य हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना करणार, ही बातमी वृत्तपत्रात झळकताच, हिंदुमात्रांत एका नवचैतन्याचा साक्षात्कार सणाणला. अनेक ठिकाणांहून अभिनंदनाच्या तारांचा पत्रांचा वर्षाव होऊ लागला. हिराबागेत जिज्ञासू प्रेक्षकांची अलोट गर्दी जमली. आजवर जे कधी कोठे घडलेच नाही ते आज घडणार या उत्कंठेने जनतेची उत्सुकता शिगेला गेली. सभेच्या ठिकाणी काही नामांकित क्रिस्ती मिशनरीही आले. त्याचे गजाननरावांनी जातीने आगत स्वागत केले. सर्वत्र ऊद धुपाचा सुगंधी परिमळ पसरला होता. व्यासपीठावर पुष्पमालांनी शृंगारलेले अग्निपात्र चंदन कापुरादींनी भरून ठेवले होते. आजूबाजूच्या समया तेवत होत्या. बरोबर सहाच्या ठोक्याला श्री. सुंदरराव वैद्य (अग्निहोत्री) निळा झगा आणि तांबडी पगडी घालून प्रवेशले. पाठोपाठ गजाननराव आणि बाळासाहेब राजे तसलेच पायघोळ निळया रंगाचे झगे आणि पगड्या घालून सभास्थानी येताच, टाळ्यांचा कडकडाट झाला. लगेच अग्निहोत्री सुंदररावांनी अग्नी प्रज्वलित केला आणि वैद्य राजे यांनी गंभीर स्वरात
अग्निमीळे पुरोहितम्
यज्ञस्य देव ऋत्विजम्
या वेदमंत्राचा घोष चालू करताच, हिंदूच्या उद्धाराचे एक नवेच जग जन्माला येत असल्याच्या साक्षात्काराने सभागृह स्वस्थचित्त नि गंभीर झाले. सुमारे अर्धातास हा विधी झाल्यानंतर, गजाननरावांनी हिंदू मिशनरी सोसायटी, तिथे उद्देश कार्यक्रम यांवर दीडतास रसाळ प्रवचन केले. वैद्यांच्या वाणीत अपरंपार जिव्हाळा. विनयशाली रसाळपणा आणि हिंदुत्वाबद्दल निष्ठावान भक्ती ओसंडून जात होती. समारंभ आटोपताच, तेथे आलेल्या वेलिणकर नावाच्या एका ओळखीच्या क्रिस्ती मिशनरीला मी विचारले, "काय, वेलिणकरसाहेब. काय वाटते तुम्हाला?" "विलक्षण साधू पुरुष आहेत हे तुमचे वैद्य. आम्ही काय सांगणार?" तो उत्तरला.
शुद्धी कसली? छे छे, उपनयन
`होवो जगाचा गुरू आर्यधर्म, देवा जगी वाढवी हिंदुधर्म` या हेतुच्या सफलतेसाठी गजाननराव वैद्यांनी दोन वैदिक विधींचे संशोधन करून, ते अंमलात आणले. पहिला उपनयन विधी हिंदु धर्मात प्रवेश करू इच्छिणारांसाठी देशांना `शुद्धिविधी` हे नाव मुळीच संमत नसे. ते म्हणत "एखाद्याला आपण प्रथम अ-शुद्ध ठरवायचे आणि मग त्याला शुद्ध करून घेण्याचा अहंकार गिरवायचा, हे योग्य नाही ते आपण होऊन हिंदुधर्मात येताहेत, त्यांचे आपण फक्त उपनयन करावे. त्यांना जवळ करावे."
वैद्यांनी व्याख्यानांद्वारा आणि हिंदू मिशनरी साप्ताहिकाच्या प्रसाराने आपले मिशनरी कार्य जोराने आणि निष्ठेने चालविण्यास सुरवात करताच पहिला उपनयन विधी जाहीररीत्या केला तो एका वहिदुद्दिन नावाच्या जन्मजात मुसलमानाचा. त्याचे ७५ वर्षाचे वृद्ध वडील एका सायंकाळी वैद्यांना भेटायला आले. ते म्हणाले, "महाराज, जातीने जरी मी मुसलमान असलो, तरी सारी हयात श्रीकृष्णभक्तीत घालविली नि घालवीत आहे. आता आपण माझ्या या तरुण चिरंजीवाला हिंदुधर्माची दीक्षा द्यावी." दीक्षा देताना वहिदुद्दिनचे नाव त्याच्या वडलांच्या सांगण्यावरूनच गोपालदास असे ठेवण्यात आले. कृष्णभक्तीत आधीच वाढलेल्या वहिदुद्दिना उपनयन विधी होताच त्याचा चेहरामोहरा आरपार पालटला.
त्याच सुमाराला लो. टिळक मुंबईला आल्याची संधी साधून, वैद्यांनी त्यांची बोरीबंदरवर भेट घेऊन, गोपालदासला त्यांच्या पायावर घातले. टिळकांना गहिवर आला आणि ते म्हणाले. "गजाननराव प्रथम मला तुमच्या कार्याचा पल्ला नीटसा अंदाजता आला नाही, पण आता मात्र मी या कार्याला मनःपूर्वक आशीर्वाद देतो. सामाजिक कार्याला असल्या धार्मिक क्रांतीची आवश्यकता बरीच आहे."
वैदिक विवाहविधीचे संशोधन
हिंदुजनांतील असंख्य जातीत विवाहविधीच्या पद्धती भिन्नभिन्न विधिसाम्य (म्हणायचेच तर) `शुभ मंगल सावधान` या ठराविक बँडबाजात. शिवाय, वैदिक आणि पौराणिक भेदांचे तंटे असायचेच, वैदिक विधींत अनेक सामाजिक रूढींची भरमसाट सरमिसळ झालेली. त्यामुळे एकंदर विधींत वैदिक कोणते नि अवैदिक कोणते, याचा थांगपत्ता लागेना. या प्रश्नाकडे लो. टिळक यांचे लक्ष होतेच. गजाननराव वैद्य आणि टिळक यांचा संबंध पितापुत्रयत. हिंदु मिशनरी कल्पनेच्या आधी कित्येक वर्षे, एक दिवस त्यांनी वैद्यांना विवाह विधींचे संशोधन करण्याची कामगिरी सांगितली. "आपली विवाह पद्धती दिवसेंदिवस भलतीकडेच वहावत चालली आहे. धार्मिक विधीत सामाजिक रूढींचा संकर झालेला आहे. माझ्यामागे हजार भानगडी. तू पटाईत संस्कृतज्ञ. तेव्हा तूच या विधीचे संशोधन करण्याचे कार्य हाती घ्यावे." टिळकांच्या सूचनेप्रमाणे वैद्य अनेक वर्षे या कार्यात मग्न होते.
सीलोनमार्गे लंडनला जाण्यासाठी लो. टिळक मुंबईला आले असताना, वैद्यांनी संशोधनपूर्वक तयार केलेल्या वैदिक विवाहविधीची जातीने तपासणी करण्यासाठी मुद्दाम, अर्थात वेळात वेळ काढून, ते वैद्यांच्या घरी (भाई जीवनजी लेनमध्ये) गेले. सुमारे दोन तास परीक्षण व चर्चा चालली होती. आजूबाजूला आम्ही सारे ते पहात होतो. दोन संस्कृतज्ञांची चर्चा चिकित्सा होती ती (१) अग्न्यावाहन, (२) अनुमति (३) मधुपर्क (४) कन्यादान (५) कन्याप्रतिग्रह (६) पाणिग्रहण-प्रतिज्ञा (७) विवाहहोम (८) लाजाहोम (९) सप्तपदी (१०) गृहप्रवेशविधी आणि (११) अखेर शांतिसूक्ते, एकेक भाग चर्चिला जात होता.
सर्व वैदिक विधी तपासून टिळकांनी समाधान व्यक्त केले. वैद्य म्हणाले, "हा विधी मी पुरा जुन्या संप्रदायांतून घेतला. तो तपासून पहाताना छापलेली पुस्तके पाहिली व तोंडी माहिती मिळवली. सावधान चित्ताने विधीचा एकेक भाग संशोधून पाहिला. संशोधनकर्म पुरे झाले व ॐ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु हे अन्त्यवचन लिहिले गेले. त्यावेळी गुरुवार तारीख १९ डिसेंबरच्या (१९१८) रात्री दीड वाजला होता. अनेक दिवसांची चिंता अंत पावली व माझे चित्त स्वस्थ झाले."
लो. टिळकांचा अकल्पित विनोद
चर्चेच्या अखेरीस टिळक हसत हसत म्हणाले, "हे बघ गजाननराव या तुझ्या संशोधित विधीने लग्न करून घ्यायला कोण तयार होणार? मी तरी खास नव्हे. (मंडळींत हास्याची खसखस पिकते) अरे, तब्बल दोन तास अग्निकुंडातल्या धगीजवळ बसतो कोण?" वैद्य "विधी हवा तर बसले पाहिजे." टिळक- "माझा साफ नकार आहे. मी बसणार नाही. हे पहा, गजानना, अग्नीचे आवाहन करताना तुझ्या रसिकतेने १०-१० १५-१५ सुंदर ऋचा निवडल्या. त्या एवढ्या कशाला? देवाची प्रार्थना एकदोन ऋघांनीही साजरी होते. तेव्हा, हा ऋचांचा भरमसाट संसार काटछाट करून, सगळा विधी एक तासात आटोपता येईल, अशी व्यवस्था करावी." त्याप्रमाणे वैद्यांनी केले आणि वैद्य-संशोधित वैदिक विवाहविधी सर्वत्र चालू झाला.
वैदिक विवाह विधीचा प्रचार
कै. गजानन भास्कर वैद्यांनी संशोधन केलेल्या आणि लो. टिळकांनी स्वतः तपासून संमत केलेल्या विवाहविधीचा प्रचार, वैद्यांचा एक अनुयायी म्हणून, मुंबईत मी बराच केलेला होता. इतरांना धीर येण्यासाठी आणि त्या विधीचे महत्त्व समजण्यासाठी, प्रथम मी स्वतः आचार्य आणि नुकतेच दिवंगत झालेले) सुंदरराव वैद्य अग्निहोत्री, मिळून मेहुण्याचे लग्न दादरला लावले. या प्रयोगाचा जातभाईत उत्कृष्ट परिणाम झाला आणि त्या लग्नसराईत कमीत कमी ५०-७५ विवाह आचार्य या नात्याने मी साजरे केले.
या प्रचाराचे लोण पुण्यात नि आजूबाजूला पोहोचविण्याचा यत्न मी करीत होतो. पुण्याचे आमचे जातभाई (चां. का. प्र.) फार मोठे चोखंदळ नि चिकित्सक. स्वतः काही नवीन प्रघात चालू करता आला नाही, तरी दुसरा कोणी तसे करीत असला तर त्यात रगड शंकाकुशंकांचे लोणचे घालतील. शेजारधर्माचा धसका असतो ना! नवीन पाऊल टाकलं तर बामनं काय म्हंगत्याल?
अखेर या विधीची इष्टानिष्टता नीट पाखडून पहाण्यासाठी जातभाई तज्ज्ञांची (?) एक कमिटी नेमण्यात आली. कमिटी म्हटली म्हणजे कंबक्तीच ती. ती कधी जमायची नाही नि चुकूनमाकून जमलीच, तर पुढची तारीख ठरवून वितळायची. त्या कमिटीचे अध्यक्ष होते श्री. रावसाहेब के. टी. गुप्ते, पब्लिक प्रॉसिक्यूटर
आधी केले नि मग सांगितले
लग्नसराईच्या हंगामात एका सकाळी कै. गुप्ते सहधर्मचारिणीसह अचानक माझ्या बिऱ्हाडी आले. त्यांचा जामानिमा पाहून हे बहुतेक लग्नाचे निमंत्रण द्यायला आले असावे, अशी साहजिकच माझी कल्पना. चांदीच्या वाटीतल्या कुंकुमाकित अक्षता सुपारी माझ्या हातात ठेवीत ते म्हणाले "केशवराव, आचार्य नात्याने आमच्या घरी वैदिक विधीने विवाह साजरा करण्यासाठी आपण यावे असे मी निमंत्रण देतो आहे." के. टी. कडचा विवाह फार मोठ्या थाटामाटात विधी साजरा झाला. आचार्य मी आणि प्रो. दिनकरराव समर्थ अग्निहोत्री आबालवृद्ध स्त्रीपुरुषानी, विधीची सांगता चौकसपणाने पाहिली. समाधान व्यक्त केले. समारंभाला झाडून सारे ज्ञातनेते आले होते. भोजनोत्तर श्री. बाप्पा बेंद्रे (हे त्या कमिटीचे सेक्रेटरी होते आणि विधीचे कट्टर पुरस्कर्ते होते.) यांनी "वैदिक विधीबद्दल कमिटी कधी बोलवायची?" असा मुद्दाम सवाल टाकला. त्यावर के. टी. स्मितहास्य करीत म्हणाले. "कमिटीचा निर्णय तर आज जाहीरच झाला. खुद अध्यक्ष या नात्याने मीच दिला आहे. आता भरल्या पोटी कमिटीला रजा."
के. टी. गुप्ते यांच्या या प्रोत्साहनाने वैदिक विधीने पुढे अनेक विवाह पुण्यात नि आसपास आचार्य नात्याने साजरे करण्याचे योग मला लाभले. आज हा विधी अनेक जातीय स्वयंसेवक सर्वत्र विनावेतन साजरे करीत असतात. रुळावरच्या डब्याला धक्का देऊन गतिमान करण्याचे काम कठीण तर खरेच, पण ते कोणीतरी केल्यावर पुढे डबा कोणीही सरळ ढकलीत नेतो,
क्रिश्चॅनिटीला पहिला सुरुंग
रेवरंड टिळकादी मंडळी ज्या जमान्यात क्रिस्ती धर्मात गेली, त्याच काळात ज्वरबिंदु औषधाचे संशोधक डॉ. गोवंडे हेही सहकुटुंब क्रिस्ती झाले होते. हिंदू मिशनरी चळवळ चालू होताच, डॉ. गोवडे, सौ. गोवडे, त्यांचे दोन कर्तबगार तरुण सुपुत्र, सारी मंडळी वैद्यांनी एका जाहीर सभेत उपनीत केली. क्रिस्ती मिशनात हाहाकार उडाला.
परधर्मात गेलेली मंडळी परत हिंदुधर्मात आली, तरी त्यांना जन्माच्या जातीत समरस करून घेण्याचा प्रश्न फार बिकट होता. त्या दिशेने नागपूरचे एक कट्टर हिंदुधर्माभिमानी के. चिंतामण हरि मराठे, हे पुढे सरसावले. उपनीत गोवंडे कुटुंबातील दोघा तरुणांना त्यांनी आपली स्वतःची आणि एका सजातीय (चित्पावन) स्नेह्याची मुलगी विवाहात कन्यादान करून त्या बिकट प्रश्नाची सोडवणूक केली. ते विवाहही जाहीरपणे थाटामाटात साजरे झाले.
हिंदू मिशनरी कार्याचा झपाटा
वैद्यांच्या वैद्यभुवनात दररोज कोणी ना कोणी हिंदुधर्म-प्रवेशासाठी आणि वैदिक विवाहासाठी येऊ लागला. त्याशिवाय, क्रिस्ती मिशनरीच्या कळपात कोणकोण सावजे घेरली. जातात. यावर सारखे लक्ष ठेवण्याची यंत्रणा चालू झाली. एकदा सुळे आडनावाचे एक कुटुंबच्या कुटुंब, दारिद्र्य निवारणाऱ्या भुलावणीने, क्रिस्ती मंडळीने आपल्या ताब्यात घेतल्याची बातमी समजली. तात्काळ गजाननरावांनी तपास चालू केला, तोच त्या कुटुंबाच्या यजमानाचेच पत्र हाती पडले. "आम्ही अडकलो आहोत आणि उद्या आमचा बाप्तिस्मा करणार आहेत, तर वाचवा", स्वतः गजाननराव, सुंदरराव, बाळासाहेब राजे वगैरे मंडळींनी पोलिसांची मदत घेऊन, मध्यरात्री भायखळ्याच्या क्रिस्ती कोण्डवाड्यातून त्या कुटुंबाची सुटका केली.
कोळी कुटुंबांचे धर्म-परावर्तन
मुंबई उरणादी लत्त्याला नेहमी दिसणारी कोळी मंडळी धर्माने क्रिस्ती असतील. याची तोवर कोणालाच काही कल्पना नव्हती. बरोबरच आहे. त्यांचे आधारविचार, सणवार, सारे हिंदूप्रमाणे. गौरीगणपतीचे उत्सवही ते धूमधडाक्याने साजरे करीत. फार काय, चैत्री पौर्णिमेला कार्ल्याच्या एकविरा देवीची यात्रा प्रामुख्याने कोळी भगिनी बांधवांची. सेंट्रल रेल्वेच्या गावा भरभरून ते यात्रेला हमखास जातात. ही मंडळी धर्माने क्रिस्ती, हा संशयही कधी कोणाला आला नाही. `बावतीस` (बाप्तिस्मा) `लगीन` आणि `मरतिक` हे तीन विधी क्रिस्ती मिशनरी करीत. बाकीच्या त्याच्या सणवार उत्सवांवर त्यांची काही मात्रा चालत नसे. या जमातीतील बरीच कुटुंबे एका विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर वैद्यांनी जाहीर समारंभाने उपनीत करून घेतली. तेव्हापासून हा क्रम वैद्यांच्या निधनानंतरही श्री सुंदररावांनी चालवून अनेक कोळी कुटुबे हिंदुधर्मात आणली.
एका पारसी पंडिताची स्नेह-गाठ
दादरच्या हिंदू कॉलनीला आज जे रूप आलेले आहे. त्याला प्रारंभी भरणी` हे नाव होते. नुकतेच तेथे छोटे बंगले उगवत होते. पहिला बैठा बंगला कै. बाळासाहेब वैद्य यांचा तांबे इंजिनिअर यांनी उभारला शेजारच्याच एका एकमजली बंगल्यात जमशेटजी सकलातवाला नावाचे एक वृद्ध पारसी पंडित रहात असत. हे टाटा कंपनीत मॅनेजरच्या हुद्यावर होते. बाळासाहेब वैद्यांच्या मध्यस्तीने माझा त्यांचा परिचय झाला. जमशेटजींच्या बंगल्यात पाऊल टाकले का जिकडे नजर जाईल तिकडे असंख्य लहानमोठ्या नानाविध विषयांवरील ग्रंथांचा संसार आकर्षक शेल्फा नि कपाटात थाटलेला. जमशेटजी न्याहारी घेत असले तरी एका हातात कसले ना कसले पुस्तक असायचेच विलक्षण स्वाध्यायशील असामी. भेटीला जाताच. भाषण चर्चा व्हायची ती एखाद्या ठळक तात्त्विक धार्मिक विषयावरच आलतू फालतू गोष्टींना तेथे थारा नसायचा. जमशेटजीच्या संगतीमुळे मला झोरास्टरच्या धर्मविषयक ग्रंथांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली.
जमशेटजी म्हणायचे. "वैदिकांत नि पारश्यात तसा काही भेद नाही. दोघेही मूळचे एकच आर्य तुम्ही पूर्वेकडे आलात, आम्ही पश्चिमेकडे गेलो. वैदिकाची छंदव्यवस्था, आमची झेंदावस्ता आमचे विवाहविधीसुद्धा जवळ जवळ वैदिक विधीप्रमाणेच होतात. त्यांचा क्रिश्चॅनिटीचा अभ्यासही दांडगा होता. त्यामुळे त्यांच्याकडे कोणी ना कोणी विद्वान पाश्चात्य मिशनरी वरचेवर विचार-विनिमयासाठी येत असत. थोडक्यात सांगायचे तर जमशेटजीच्या बंगल्यावर गेले का तेथे काव्यशास्त्रविनोदाची अखंड लयलूट चाललेली असायची, तास दोन तास कसे कुठे गेले पत्ता लागायचा नाही."
जमशेटजीच्या बंगल्यावर एका जगप्रसिद्ध क्रिस्ती पंडिताचा परिचय मला झाला. त्याचे नाव फरक्हॉर त्यांनी सारा हिंदुस्थान पायदळी घातला होता. भेटले त्यावेळी भागवत धर्माचा त्यांचा अभ्यास आणि समाज-निरीक्षण चाललेले होते. महाराष्ट्रातली खेडूत जनता नाक्षर आणि अशिक्षित, यावर आमची चर्चा चालली असता, फरक्हॉर म्हणाले, "मी हा सिद्धांन्त मानायला तयार नाही. खेडुतांना अक्षरांची ओळख नसेल, त्यांना लिहिता येत नसेल, पण त्यांना अडाणी किंवा अप्रबुद्ध म्हणायला मी तयार नाही. उलट, शहरी साक्षरांपेक्षा त्यांची नीती नि धर्मविषयक बौद्धिक पातळी उंचावलेलीच मला जागोजाग आढळली." मी क्रिस्तीधर्म प्रचारासाठी एका खेड्यात गेलो असता, शेतावर काम करीत असलेल्या एका वृद्ध खेडुताने. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, जनाबाई इत्यादी कितीतरी संतांचे अभंग फडाफड माझ्या तोंडावर फेकून माझ्या प्रत्येक मुद्याला तो सडेतोड उत्तर देत होता. खेडुताचे संतवाङ्मयाचे पाठांतर म्हणजे त्यांच्या बौद्धिक परिणतीचा रोखठोक पुरावा नव्हे? खेड्यातली भजनी मंडळे भागवत धर्माचे किल्लेकोटच म्हणावे लागतील फरक्हॉरने मला दोनतीन क्रिस्ती धर्मविषयक ग्रंथ अभ्यासासाठी नजर केले.
श्री राममारुती पुण्यतिथी
दादरला संत श्री रामभारती महाराजाची पुण्यतिथी दरसाल साजरी होत असते. सन १९१९ साली ती दादर इंग्लिश स्कूलच्या हॉलमध्ये साजरी झाली. त्यावेळी हिंदुधर्माचे दिव्य या विषयावर माझे जाहीर व्याख्यान आणि आद्यमिशनरी गजाननराव वैद्य अध्यक्ष, असा योग कार्यकत्यांनी जुळवून आणला जमशेटजी सकलातवाला, रेवरंड फरक्हॉर याना घेऊन अगत्याने सभेला आले होते. सुमारे दोन तास माझे व्याख्यान झाले. वैद्यांनी अध्यक्षीय समारोप करण्यापूर्वी फरक्हॉर यांना काही बोलावे अशी विनंती केली. ते म्हणाले- ऐतिहासिक पुराव्यांनी खच्चून भरलेले ठाकरे यांचे प्रवचन ऐकून मला फार आनंद झाला. भागवत धर्माने खरे म्हटले तर धर्मसंरक्षणासाठी शांततेचे पण निर्धाराचे युद्ध केलेले आहे. तथापि, महाराष्ट्रातल्या बहामनी राज्याचे सर्व संस्थापक बाटलेले हिंदूच होते. हा ठाकरे यांनी नावनिशीवार दिलेला पुरावा जितका मनोरंजक तितकाच तो आश्चर्यकारकही आहे.
हे व्याख्यान पुस्तकरूपाने प्रसिद्ध व्हावे, या वैद्यांच्या जाहीर सूचनेप्रमाणे दि. २० ऑक्टोबर १९१९ रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रसिद्ध करण्यात आले. त्याची प्रस्तावना लिहिताना वैद्य म्हणतात, "ग्रंथकाराची ओळख करून द्यावयाची म्हणजे ते अभयाने लिहिणारे व बोलणारे सत्त्वशील इतिहासभक्त आहेत. ग्रंथ वाचीत असताना वाचकांना असे आढळेल की, अनेक भावनामय असा कोणी जीव आपल्याशी बोलत आहे. तोच खरा तेजस्वी ग्रंथकार ग्रंथकाराचे नाव किंवा त्याचे छायाचित्र हे ग्रंथकाराचे खरे स्वरूप नव्हे. पतित करावे पावन हे वचन वाचून हिंदुजन लोकसंग्रहाचा विचार करू लागले तर त्याचे पुण्य केशवरावजींना लागेल. किती हिंदू, मुसलमान होऊन मोठे राज्यकर्ते झाले तो इतिहास वाचून लोकसंग्रहाच्या बाजूने विचार करण्याची बुद्धी हिंदुजनांना होईल व केशवरावजींची लेखणी यशस्वी होईल.`
या पुस्तकाची पहिली ३,००० प्रतीची आवृत्ती अवघ्या चार महिन्यात संपली म्हणून मोपल्यांच्या बंडाच्या धामधुमीत "हिंदु धर्माचे दिव्य पुस्तकाला संस्कृतीचा संग्राम या जादा माहितीचे जोड पुस्तक जोडून, दादरच्या नरेन्द्र बुक डेपोने दुसरी आवृत्ती बाहेर काढली." या जोड पुस्तकाचे गुजराथी भाषांतर अहमदाबाद येथे शुद्धीकरण संघटनेने प्रसिद्ध केले होते.
वैद्यांच्या व्यक्तिमत्वाची प्रशस्ती
हिंदू मिशनरी चळवळीचा झपाटा सारखा वाढत चालला. सनातनी भावनातच सर्वस्व पहाणाऱ्या हिंदूना जरी त्याचे महत्त्वमापन होऊ शकले नाही, तरी संस्थेच्या स्थापनेच्या दिवशी मुंबई गव्हर्नरची विलायतेला तार गेली होती की, आज ही संस्था सूक्ष्म रूपात आहे. अनपकारी (इन्नोसण्ट) आहे. पण हिच्या कार्याचे परिणाम कालवशात दूरवर भिडणारे (फार रीचिंग) आहेत. "तथापि, क्रिस्ती आणि मुस्लिम क्षेत्रातल्या धर्मनेत्यात बरीच खळबळ चालू होती. एक दिवस सकाळी मुंबईचे बिशप गजाननराव वैद्यांना भेटायला आले. माडीवर एक तासभर त्यांची दिलखुलास बोलणी चाललेली होती. बिशप जेव्हा खाली येत होते. तेव्हा आम्ही काही मंडळींनी त्यांना विचारले. काय बिशपसाहेब, झाली का आपली मुलाखत?" पाणावलेल्या डोळयांनी ते उद्गारले "आजवर आम्ही क्रिस्ताला बायबलातच पहात होतो. पण आज मला वैद्यांच्या रूपाने साक्षात क्रिस्तदेव भेटल्याचा साक्षात्कार झालासा वाटला." हाच प्रकार जेव्हा मुस्लिमांचा एक धर्ममार्तण्ड वैद्यांच्या भेटीला आला, त्यावेळीही पडला.
सरकारी रिपोर्टरांच्या गराड्यात व्याख्यान
हिंदू मिशनरी कार्याचा प्रसार करण्यासाठी मी बाहेरगावी जावे, अशी सूचना गजाननरावांनी केली. खानदेश, वऱ्हाड, नागपुरापर्यंत दौऱ्याचा विचार ठरवून मी महिन्याची हक्काची रजा काढली. चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, करीत करीत मी अकोल्याला आलो कै. दिघे वकिलांच्या येथे छावणी ठेवली. शहरात हस्तपत्रिका वाटण्यात आल्या. व्याख्यानाचा विषय `स्वराज्य मिळविण्याची सोपी युक्ती` असा मुद्दामच जाहीर केला. वकील मंडळींनी बोट क्लबात कार्यक्रमाची छान व्यवस्था ठेवली. त्यावेळी ब्रिटिशांची राजवट होती आणि नुसता `स्वराज्य` शब्द उच्चारण्याचीही पंचाईत होती आणि व्याख्यान तर त्याच विषयावर. एकदम पोलीस खात्यातल्या चित्रगुप्तांची धावपळ चालू झाली. माझ्या व्याख्यानांच्या बेडर तिखटपणाचे रिपोर्ट खानदेशातून वऱ्हाडात आगाऊच रवाना झाले होते. सभेच्या ठिकाणी जात असता, वाटेतच रिपोर्टरांच्या छोट्या छोट्या टेबल खुर्च्याची धावाधाव दिसली. सभागृह तुडुंब भरले होते. महिलावर्गही बराच होता.
व्यासपीठासमोरच पोलीस लघुलेखकांची आठ टेबले रांगेने मांडलेली होती. सुरुवातीला मुख्य रिपोर्टर साहेबांचा नि माझा दिघे वकिलांनी परिचय करून दिला. "मीही एक वृत्तपत्रीय क्षेत्रातला लघुलेखक रिपोर्टर आहे", असे सांगताच, आमचे लघुलेखन पद्धतीवर थोडेसे भाषण झाले. आपली भाषणाची स्पीड किती आहे? असे त्याने मला विचारताच, "ती किती का असेना, मी अगदी मिनिटाला ६० ते १०० शब्दांच्या स्पीडने बोललो, तरी आज, इन्स्पेक्टर साहेब, आपल्याला आत्ताच सांगून ठेवतो. थोड्याच वेळात तुमचे लघुलेखन बंद करून माझे फक्त भाषणच ऐकावे लागेल." सारा गोंधळ स्वराज्य या शब्दाने केला होता आणि लोकांच्या आकर्षणासाठी, वकिलांच्या सल्ल्यावरूनच. आम्ही तो हस्तपत्रिकेत योजिला होता. पण भाषण हिंदू मिशनरी विषयावर होते, याची कल्पनाच कोणाला नव्हती. प्रवासात जाताना, सोसायटीने विधीपूर्वक उपनीत करून हिंदू धर्मात आणलेल्या स्त्रीपुरुष व्यक्तींचे फोटोग्राफ व्याख्यानात प्रदर्शनासाठी मुद्दाम बरोबर घेतले होते.
व्याख्यानाला सुरुवात झाली. हिंदू संघटनांच्या मुद्यावर बोलता बोलता. हिंदू मिशनरी कार्याचा इतिहास आणि तिने बजावलेले कार्य यावर उपनीतांच्या फोटोंचे प्रदर्शन करू लागताच, सभास्थानी जिज्ञासा, उत्कण्ठा नि कौतुकाचे विलक्षण वातावरण तर निर्माण झालेच, पण आमचे पोलीस रिपोर्टरही लेखण्या खाली ठेवून व्याख्यानाचे निष्ठावंत श्रोते बनले. कार्यक्रम आटोपल्यावर, सर्व फोटोंचे निरीक्षण परीक्षण करण्यासाठी स्त्रीपुरुषांनी गर्दी केली. तेव्हा पोलीस प्रमुखानेच ते सर्व जिज्ञासूंना नीट दाखवून सुखरूप परत मला देण्याची कामगिरी स्वयंस्फूर्तीने बजावली. चहापानाच्या वेळी ते मला म्हणाले - "आजचा तुमचा विषय अगदी नवा, तसाच मोठा चित्ताकर्षकही मुंबईला तुमच्या हिंदू मिशनरी सोसायटीने चालविलेल्या कार्याबद्दल इकडच्या लोकांना खरोखरच काही माहिती नव्हती आजवर. विषयाचे हे स्वरूप आम्हांला आधी कळते. तर हा लघुलेखकांचा तांडा घेऊन येण्याचे काही कारणच नव्हते."
मी : अहो, पण मी स्वराज्याच्या युक्तीचा पुकारा केला नसता, तर तुम्हा सरकारी लोकांना तरी आमच्या सोसायटीच्या धर्म-क्रांतिकारक कार्याची हकिकत कशी कळली असती? सभाजनाबरोबर तुम्ही सरकारी नोकरांनीही माझे भाषण चोपड्या चिताडण्याऐवजी शांत चित्ताने श्रवण केल्याबद्दल धन्यवाद.
उपनयनाचा साधा नि सोपा विधी
अकोल्याचा प्रचार आटोपल्यावर मी नागपूरला गेलो. तेथे चिटणीस पार्कमध्ये जाहीर व्याख्यान झाले. सभेला विलक्षण गर्दी होती. भाषण संपताच प्रश्नोत्तरे झाली. त्यात क्रिस्ती धर्माचे एक बड़े रेवरण्ड हजर होते. त्यांचे माझे चांगलेच जुंपले.
रेव : परधर्मियांकडे अन्नभक्षण केल्याने हिंदू बाटतो की नाही?
मी : हिंदूला बाट कशानेही लागत नाही.
रेव. : तुम्ही मुसलमानांकडे जेवाल का?
मी : आम्ही वाटेल त्याच्या हातचे खाऊ आणि हिंदू राहू
रेव : तुम्ही गोमांस खाल काय?
मी: गोमांसच काय, तुम्हाला खाऊ, तुमच्या क्रिस्ताला खाऊ, सगळ्या जगाला खाऊ आणि वर निर्भेळ हिंदूच राहू आजकालची ही नवी जनस्मृती आहे.
अध्यक्षस्थानी गोविंदराव प्रधान, वकील होते. त्यांनी वाद बंद केला. त्याच सभेत दोन बाटलेल्या क्रिस्ती तरुणांनी "आम्हाला परत हिंदुधर्मात यायचे आहे", असे पुढे येऊन सांगितले. चिंतामणराव मराठ्यांनी, "तुमचा उपनयन विधी उद्या करू मला येऊन भेटा आज रात्री" असे जाहीर सांगितले किस्ती छावण्यात गडबड चालू झाली. त्याचप्रमाणे नागपूरच्या हिंदू समाजातही ती बातमी फैलावली. आम्ही पंधरावीस हिंदू मिशनरींनी रात्री बेत ठरविला. दुसऱ्या दिवशी सकाळीच ते दोघे तरुण चिंतामणरावाच्या बिऱ्हाडी आले. त्यांना बरोबर घेऊन आम्ही मिरवणुकीने शुक्रवारी तलावाकडे निघालो. वाटेत शेकडो हिंदू मंडळी आम्हाला सामील झाली. धर्मपरावर्तनाचा उपनयन विधी कसा करतात, तो पाहण्याची ज्याला त्याला उत्कण्ठा होती. तलावावर जाताच मी त्या दोघा तरुणांना, "तुमचा निश्चय कायम आहे ना?" विचारले. त्यांना जोरदार होकार दिला.
आसपास बरेच क्रिस्ती मिशनरी उभे होते.
मी : बंधूनो, तुम्हाला जेव्हा क़िस्ती धर्माची दीक्षा देण्यात आली. तेव्हा कसला विधी केला, ते सगळ्या लोकांना स्पष्ट सांगा.
एक तरुण : प्रथम त्यांनी बायबलातले काही वाचले. नंतर एका भांडयात आणलेले पवित्र पाणी त्यांनी आमच्या कपाळाला. दोन्ही बावखंडाला आणि छातीला लावले. पुन्हा काही प्रार्थना केली आणि म्हणाले. "आता तुम्ही आमच्या धर्माचे झाला."
मी : बस्स, इतकेच? ठीक आहे. उतरा पाण्यात. (ते कंबरभर पाण्यात उतरले.) मारा बुचकळी.
वर येताच त्यांनी गायत्री मंत्र म्हणायला लावले. असे तीन वेळा केले. "कृष्णं वन्दे जगद्गुरुम् हा मंत्र म्हणत करा आता स्नान आणि या वर." मी म्हणालो. त्यांनी तसे करताच, चिंतामणराव मराठ्यांनी गीतेचा अकरावा अध्याय मोठ्याने वाचून त्यांना ऐकवला आणि मी पुन्हा गायत्री मंत्राचा मोठ्याने उच्चार करून, त्यांच्या गळ्यात यज्ञोपवित घातली. झाला उपनयन विधी. इतक्या सोप्या विधीने ही हिंदू मिशनरी सोसायटी उपनयन विधी करू लागली, तर मोठी आफतच झाली म्हणायची असे उद्गार तेथे आलेल्या क्रिस्ती मंडळींच्या तोंडून बाहेर पडले.
दौऱ्यावरून परत आल्यावर गजाननराव वैद्यांना भेटताच, ते म्हणाले, "वाहवा, तुम्ही तर काय भलतीच क्रांती केली नागपूरला चिंतामणरावांचे आले होते सविस्तर पत्र मला. अहो, आपली व्याख्याच आहे ना, जो स्वतःला हिंदू म्हणवितो, तो हिंदू. विधी उपनीतांच्या नि लोकांच्या समाधानासाठी करायचा असतो."
नागपुराहून मी परतवाड्याला गेलो. तेथेही कै. गोविंदराव काळे आणि काही वकील मंडळींनी जाहीर सभा घेतली. तेथील क्रिस्तीधर्ममार्तण्ड सभेला आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतः येऊन त्यांनी मला चहाचे आमंत्रण दिले. आम्ही दोघे-तिघे त्यांच्याकडे गेलो. चहा बिस्किटांवर ताव मारला. हा धर्ममार्तण्ड सच्चा जंटलमन होता. त्याने आमच्याबरोबर धर्मविषयक बरीच चर्चा केली. फार काय, पण "आज तुम्ही प्रचारित असलेला व्यापक धर्मविचार हिंदू लोकांनी खरोखरच आचरणात आणावा. त्याचप्रमाणे इतर धर्मग्रंथांच्या समतोल अभ्यासाची ठिकाणेही सर्वत्र निघतील, तर फार छान होईल", असा अभिप्राय त्याने व्यक्त केला, त्याने मला काही लहान लहान पुस्तके दिली आणि पुढे बरेच दिवस तो माझ्याशी पत्रव्यवहारही करीत असे.
नागपूरची हिंदू मिशनरी परिषद
या दौऱ्यानंतर सुमारे चारपाच महिन्यांनी नागपूरला हिंदू मिशनरी परिषद भरविण्याचा बेत तेथील हिंदू मिशनरी कार्यकर्त्यांनी केला. मुंबईच्या मुख्य कचेरीकडे विचारणा झाली. शिष्टमंडळ आले. गजाननरावांनी परिषदेचे अध्यक्ष म्हणून समती द्यावी, अशी विनंती करण्यात आली "अहो, माझे काय, म्हणाल तेव्हा म्हणाल तेथे यायला माझी ना नाही. पण आपण एकाच म्होरक्यावर अवलंबून राहू नये. महंते महत करावे. युक्ती बुद्धीने भरावे, शहाणे करून विखरावे, नाना देशी हे समर्थांचे वचन आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. माझे मत हवे असेल तर आमच्या केशवरावजींना हा मान देणे उचित होईल." ते म्हणाले.
त्या दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे वैद्य भुवनात मी जाताच, गजाननराव म्हणाले आलात? चला, करा तयारी, नागपूरला जायचे आहे तुम्हाला आपल्या परिषदेचे अध्यक्ष म्हणून "मी आश्चर्याने चकितच झालो. नागपूर मुंबई कौन्सिलचा एकमताचा ठराव झालाय तो मान्य केलाच पाहिजे तुम्हाला." "आपला आशीर्वाद असेल तर जातो." असे म्हणून मी त्यांच्या पायांना हात लावला. "अहो, माझे कसले आशीर्वाद? आपल्याला जगद्गुरू श्रीकृष्णदेवाचे आशीर्वाद आहेत. कार्याची हाक येताच आपण धिटाईने सज्ज तयार असले पाहिजे."
प्रवासात लष्करी गोऱ्या दांपत्याची फ्रेंडशिप
प्रवासात एक मनोरंजक घटना घडली. नागपूर मेलने सेकंड क्लासातून बोरीबंदरहून मी निघालो. रजा संपल्यामुळे कलकत्त्याला जाण्यासाठी एक गोरा लष्करी अधिकारी आणि त्याची पत्नी आमच्याच डब्यात होते. आकार प्राकाराने दोघेही प्रचंड धुडेच होती. वऱ्हाडाकडे जाणारे इतर बरेच प्रवाशी दाटीवाटेने बसले होते. माझा होता लोअर बर्थ रिझर्व्ह आणि त्या दांपत्याला मिळाला होता एक लोअर आणि अप्पर, दोघांपैकी वरच्या बर्थवर कोणत्या धुडाने जावे नि ते कसे शक्य आहे, याची त्यांना विवंचना होती. मी अगदी त्यांच्या समोरच्या बाकावर बसलेला. इतर प्रवासी गोऱ्या माणसाशी कशाने बोलणार? पण मी गाडी चालू होताच त्यांच्याशी बोलण्याची सुरुवात केली. त्यानेही आपण कोण, रजेवर गेलो होतो, उद्या लष्करी कॅम्पवर कलकत्त्याला जॉईन व्हायचे आहे, वगैरे माहिती दिलखुलास दिली. संभाषणात पत्नीनेही मनमोकळा भाग घेतला.
त्यांच्याबरोबर सामानही भरभक्कम होतं. मोठमोठया चामडी पेट्या, इझी चेअर, वॉटर पॉट्स, काही विचारू नका. बहुतेक जागा भरून गेली होती. त्याने बर्थविषयी बोलणे काढले. "काही हरकत नाही. माझा हा लोअर बर्थ आपल्या मिसेसने घ्यावा, मी जाईन वर." दोघांनीही माझे फार फार आभार मानले आणि आम्ही पक्के फ्रेण्डस् झालो. कसारा येताच ते भोजनाच्या डब्यात जायला निघाले, तेव्हा त्यांनी बरोबर येण्याचा मला मनस्वी आग्रह केला. मनमाडला दोघे तुडुंब खाऊन पिऊन परत आले.
येथवर आजूबाजूचे प्रवासी माझ्याशी चकार शब्दही बोलले नव्हते. ती गोरी बाई खालच्या बर्थवर बेडिंग पसरू लागली. आणि मी वरच्या बर्थवर जाण्याच्या तयारीत आहे. इतक्यात एक शेजारचे गृहस्थ अगदी गयावया करून म्हणाले. "हे पहा साहेब, मी आहे आजारी. बर्थचे तिकीट काही मिळाले नाही. मला तर नागपूरला जायचे आहे. कृपा करून मला तुमचा बर्थ द्याल, तर उपकार होतील." काय करायचे? म्हटले, "तुम्ही चढा वर." ही अदलाबदल पहाताच तो लष्करी गृहस्थ म्हणाला, "अन् तुम्ही कुठे पडणार?"
मी म्हणालो. "मला तुमची ही ईझी चेअर या. इथंच गँगवेमध्ये पसरतो नि पडतो." त्याप्रमाणे झाले.
बादशाही सत्काराचा अकल्पित योग
आमची नागपूर मेल ज्या दिवशी सकाळी नागपूर स्टेशनात जाणार होती, त्याच वेळी व्हॉइसरॉय लार्ड आयरविन कलकत्त्याहून नागपूरला येणार होते. अर्थात त्यांच्या सत्कारासाठी खरे स्टेशन शृंगारलेले, फलाटावर लाल सकलादी पसरलेल्या, जागोजाग फुलांच्या कुंड्या मांडलेल्या असा थाट झालेला होता. आमची गाडी जी स्टेशनात गेली, ती नेमकी बरोब्बर लाल सकलादी पसरल्या होत्या तेथे थांबली. आमचा डब्बा त्याच जागेवर आला. झाले. सत्कारासाठी हारतुरे घेऊन चिंतामणराव मराठे आदी पंधरासोळा मंडळी आली होती, ती एकदम तेथेच आली. त्यांचा हारतुन्याचा समारंभ पहाताच तो गोरा लष्करी अधिकारी नि त्याची पत्नी चमकली आणि दोघेही खाली उतरून माझी क्षमा मागू लागले. "ओ मिस्टर थॅकरे, आपण इतके थोर मोठे आहात, याची आम्हांला कल्पना नव्हती. आम्ही तुमच्याशी फार लिबर्टी घेतली. त्याची क्षमा करा." आता काय करणार या त्यांच्या अजिजीला?
सकलादीचा थाट माझ्यासाठी नसून, कोणा मोठ्या सरकारी अधिकाऱ्यासाठी असावा, असे सांगावे की आबादाबाद "कशाला...कशाला...त्याचं काय घेऊन बसलात. चाललंच आहे, थँक्यू सो मच" म्हणून भेटीला आलेल्या मंडळींबरोबर चटकन पसार व्हावे? क्षणभर काही उमगेचना. अखेर मी दुसरा मार्ग पत्करला नि निसटलो. स्टेशनबाहेर पडल्यावर घडल्या प्रकाराबद्दल आमच्यात खूप हशा पिकला आणि मराठे म्हणाले, "झाला हा शुभशकुनच धरून आपण चालावे. काय केशवराव, खुष आहात ना आमच्या सत्कारावर?"
ध्वनिलेखनाची तपश्चर्या
केवळ शौक म्हणून शिकलेली विद्या अखेर पोट भरण्याचे साधन बनल्याचा मृच्छकटिकातल्या शर्विलकाला फार खेद वाटला. पण मला तसे बिलकुल वाटले नाही. कोणतीही कला, केव्हाही शिकली, तिचा जर योग्य काळी योग्य उपयोग करण्याची शहामत आपल्या अंगी असेल, तर त्याचा खेद तो काय मानायचा? स्लोन पद्धतीच्या ध्वनिलेखनाचा कळस गाठून, आपण वृत्तपत्रसृष्टीतील एक नामांकित वार्ताहर व्हावे, ही एक महत्त्वाकांक्षा. सरकारी हापिसात रोज फक्त ठराविक साच्याची पत्रेच काय ती ध्वनिलिखित करावी लागत. म्हणून बाहेरच्या सार्वजनिक हालचालीत फौण्टनपेन आणि चोपडे घेऊन, थेट अगदी एखाद्या वृत्तपत्राच्या पगारी वार्ताहराच्या दिमाखाने, मी मुंबईतील या ना त्या, पण नामांकित वक्ते असतील त्या, जाहीर सभांना हजर रहाण्याचा खाक्या ठेवला होता. कै. गजाननराव वैद्य मूळचे एकनिष्ठ थिऑसफिस्ट. त्यांच्या हिंदू मिशनरी आंदोलनातही अनेक थिऑसफिस्ट त्यांना इमानी सहकारी म्हणून लागले होते. साहजिकच, माझा त्यांचा स्नेहसंबंध जुळलेला.
मुंबईतील अनेक थिऑसफिकल लॉजेसतर्फे अनेक स्थानिक आणि अड्यारकडील थोरथोर थिऑसफिकल नेत्यांची व्याख्याने दर आठवड्याला कोठे ना कोठे व्हायची. त्या सभांना मी हटकून हजर राहून, त्यांची व्याख्याने व्हर्बेटिम (शब्दशः) ध्वनिलिखित करीत असे. असल्या सभा असल्या की मी टिपला हजर. त्यामुळे थोड्याच दिवसांत मी टिपून घेतलेल्या व्याख्यानांच्या शब्दांकित प्रती लॉजचे पुढारी मागू लागले. या उपक्रमात आरंडेल, विमादलाल, बॅ. जिनराजदास इत्यादी कितीतरी महान श्रेणीच्या पट्टीच्या वक्त्यांची भाषणे ध्वनिलिखित करण्याची संधी मला मिळत गेली. ध्वनिलेखन कलेतील खाचखोचा, अडचणी, लकबी आपोआपच उमगत गेल्या. एकदा गामदेवीला थिऑसफिस्टांचे एक कन्व्हेंशन भरले होते. त्यावेळी गामदेवी ताडमाडांची वाडीमयच होती. सेवासदनाच्या इमारतीजवळच कव्हेंशनचा मंडप उभारला होता. अध्यक्ष बॅ. जिनराजदास होते. सुकलेल्या गवतावर किनताने पसरून देशी बैठकांची श्रोत्यांसाठी व्यवस्था केलेली होती. वार्ताहरांना मात्र डेस्के दिलेली होती. जिनराजदास नमुनेदार पट्टीचा वक्ता, भाषणाची सुरवात मिनिटाला ३० ते ४० शब्दांची. पण विषयाला जसजसा रंग चढत गेला नि वक्त्याचा आवेश कळसाकडे झुकू लागला, तेव्हा तर मिनिटाला २०० ते २१० पर्यंत भाषणाचा वेग आस्ते आस्ते वाढत गेला. मीही सारखा त्या वेगाबरोबर होतो. तेथे एक अनुभव आला. ध्वनिलेखकाची स्पीड एरवी किती का असेना, पण वक्ता नि तो विषयात जर समरस रंगले, तर तो कमालीची स्पीड राखू शकतो.
ध्वनिलेखन बौद्धिक का यांत्रिक?
होमरूलच्या आंदोलनामुळे डॉ. अॅनी बेझंटबाई गोऱ्या नोकरशाहीच्या दुस्मान बनल्या होत्या. त्यांची भाषणे विकृत नि विपर्यासी शब्दांची पेरणी करून छापण्याचा, सरकारधार्जिण्या इंग्रेजी वृत्तपत्रांनी चंग बांधला होता. होमरूलचे डेप्युटेशन घेऊन बाई लंडनला गेल्या होत्या. तिकडून येणाऱ्या त्यांच्या भाषणातही घालघुसड करून ती येथे छापली जायची. विलायतेहून बेझंटबाई परत यायला निघाल्या. मुंबईत उतरताच त्यांचे पहिले जाहीर व्याख्यान येथेच करण्याचे मुंबईच्या सगळ्या लॉजीसनी ठरवले. मत्सरी वृत्तपत्रांना शह देण्यासाठी ते व्याख्यान प्रामाणिकपणे शब्दशः घेऊन छापून सर्वत्र प्रसार करण्याचे त्यांनी ठरविले.
पण असा लघुलेखक कोण मिळणार? साहजिकच गजाननराव वैद्यांनी "अहो, त्यात कसली आहे अडचण? आपल्या केशवरावांना सांगितले का काम फत्ते अशी शिफारस केली. झाले आमची नेमणूक झाली."
बेझंटबाई बोटीतून उतरताच थेट एम्प्रेस (आत्ताचे मिनर्वा) थेटरात येऊन आपले पहिले जाहीर व्याख्यान देणार होत्या. श्रोत्यांनी थेटर तुडुंब भरले. वार्ताहरांच्या टेबलावरही गचडी होती बहुतेक मला हौशी रिपोर्टर म्हणून ते चांगलेच ओळखत होते. मला पहाताच काहीजण विचारू लागले, "काय मिस्टर ठाकरे, कोणत्या पेपरासाठी स्वारी आज इथे?
मी : तुमच्या पेपरांवर कौण्टरअॅक्टींग कण्ट्रोल ठेवण्यासाठी थिऑसफिकल लॉजीसतर्फे. बाईची व्याख्याने मन मानेल ती घालघुसड करून छापता ना? पहातो कसे करता आता ते.
एकजण : अगदी व्हर्बेटिम घेणार का?
मी : यस फ्रेण्डस
पण याच क्षणाला माझ्या घरात एक विलक्षण घटना घडत होती. माझी आजी त्याचवेळी आजारी होती आणि तिचा काही भरवसा नव्हता. विनायकराव काकांना तिच्याजवळ ठेवून, जड अंतकरणाने मी या सभेला आलो होतो. आजी म्हणजे माझ्या सर्व जीवनाचे अत्यंत प्रेमाचे आदराचे तीर्थ होते. रिपोर्टिंगला बसलो खरा, पण व्यग्र मनाची ओढ सारखी घराकडे लागलेली मनश्चक्षूपुढे सारखे बरेवाईट देखावे सिनेमासारखे तरळत होते. निर्धाराने घेतलेले काम आपल्या हातून तडीला जाते की नाही, ही विवचनाही मधून मधून विचारांना सारखी दंश करीत होती.
झाले बाई आल्या. थिऑसफिकल रिवाजाप्रमाणे सेक्रेटरीने सर्वांचे आभार मानले आणि अध्यक्षाने बाईना भाषण करण्याची सूचना केली. बाई बोलू लागल्या. वार्ताहरांच्या लेखण्या चोपडयांच्या पानांवर भिरभिरु लागल्या. सुमारे एक तास बाई बोलल्या नि गेल्या. पाठपोट शंभर पानी दीड चोपटीभर माझे ध्वनिलेखन चिताडलेले होते. चोपडे घेऊन मी ग्रांटरोड स्टेशनकडे निघालो एवढा मजकूर मी चिताडला आहे. तो कोण जाणे कसा असणार तो! मनात शंकाकुशंकाचे काहूर उडाले होते स्टेशनवर गाडी आली. चोपडे उघडून वाचायला सुरवात केली. आणि काय चमत्कार! भाषणातला शब्द न शब्द स्वच्छ उतरलेला भाषणाकडे माझे किंचितही लक्ष नव्हते. कान ऐकत होते आणि लेखणी आकृत्या काढीत होती. बस्स. यापेक्षा अधिक काही नाही. घरी आल्यावर सारे भाषण टाइप केले. फूल्स्केप सहा पाने भरले. वैद्यांकडे रवाना केले. दोन दिवसांनी रिझल्ट समजला की त्यात फक्त पाचच चुका बाईनी काढल्या. बाकी सर्व करेक्ट.
याच सुमाराला प. वा. दिनशा एंडलजी वाच्छा यानी एकदोन व्याख्याने. "लघुलेखन कला इन्टेलेक्च्युअल (बौद्धिक) का मेकॅनिकल (यांत्रिक)? या विषयावर दिलेली होती आणि ती इंग्रेजी वृतपत्रात छापूनही आलेली होती. वाच्छानी लघुलेखनावर एक पुस्तकही लिहिलेले माझ्या संग्रही होते. तेवढ्या आधारावर एके दिवशी मी त्यांच्या बंगल्यावर भेटीला गेलो. अॅनी बेझंटच्या व्याख्यानाची माझी कथा त्यांना सविस्तर सांगितली. ती ऐकल्यावर ते म्हणाले - "अरे वा, हा तुमचा अनुभव काही न्याराच आहे. कला प्राविण्याची तादात्म्यता हा मुद्दा महत्त्वाचा तरं खराच, पण त्यात बौद्धिक भाग किती आणि यांत्रिक किती, हे त्रांगडेच मानावे लागेल. चला, आपण ही कला मेकॅनो-इन्टेलेक्च्युअल आहे, असा सिद्धान्त काढ़, म्हणजे झाले."
होमरूल लीगचे आंदोलन
माझ्या आयुष्यात जी अनेक मोठमोठी आंदोलने मी पाहिली, त्यांपैकी स्वदेशी चळवळीविषयी जुन्या आठवणी पुस्तकात मागे लिहिलेच आहे. आज होमरूल लीगविषयी काही आठवणी देत आहे. स्वदेशी चळवळीत लोकांच्या केवळ भावनांचा उन्माद होता, तर होमरूल चळवळीत पद्धतशीर राजकारणी क्रांतीची शिस्त होती. नेत्यांच्या व्याख्यानांतही क्रांतीची पावले कशी नि का टाकावी, याचे स्पष्ट मार्गदर्शन असे. यावेळी लोकमतांत भावना प्रबळ असली, तरी राजकारणी पाचपेचांविषयी त्यांच्या कल्पना पूर्वीसारख्या वाहयात नि विखुरलेल्या नव्हत्या. नेत्यांचे आदेश तपशीलवार पारखून, आपापल्या कुवतीप्रमाणे ते पार पाडण्याचा प्रामाणिकपणा लोकांत विशेष होता.
या आंदोलनात लो. टिळक आणि मिसेस बेझंटबाई यांचे नेतृत्व विलक्षण प्रभावी होते. मंडालेहून परतल्यावर लो. टिळकांनी, मवाळांच्या प्रभावामुळे कॉंग्रेस प्रवेश साधत नाही म्हणून मे १९१६ त होमरूल लीगची कल्पना प्रथम काढून, व्याख्यानांचे दौरे चालू केले. जोडीला बेझंटबाईची व्याख्याने मुंबई नागपुराकडे दणाणू लागली होती. टिळक आणि बेझंटबाई जातीवंत जहाल, बेझंट याच सुमाराला थिऑसफीचे धर्मक्षेत्र किंचित बाजूला सारून राजकारणाच्या आखाडयात उतरल्या होत्या. उतरल्या त्या मात्र तन मन धनावर चक्क तिलांजली वाहून! बाईंच्या ज्वलज्जहाल व्याख्यानांनी मुंबई सरकार गांगरून गेले. ब्रिटिशांनी मुंबई, नागपूर या प्रांतांत प्रवेश करण्याचा बंदी- हुकूम बाईंवर बजावला. आधीच तापलेल्या लोकमतावर सरकारने पेट्रोलच ओतले. बेझंटबाई विलायतेला गेल्या आणि तेथे त्यांनी होमरूल लीगची लंडन शाखा स्थापन करून त्या परत आल्या. लगेच त्यांनी मद्रास येथे लीगची भारतीय शाखा चालू केली, त्यांनी आपले `न्यू इंडिया` हे इंग्रेजी दैनिक याच कार्याला सर्वस्वी वाहून घेतले.
बिनीचे थिऑसफिस्ट राजकारणात आले
बेझंटबाईच्या प्रभावी नेतृत्वामुळे बहुतेक सारे बिनीचे थिऑसफिस्ट होमरूल लीगच्या प्रचार कार्याला जुंपले गेले. न्यू इंडिया पत्राचा राजकारणी प्रचार इतका जबरदस्त जहाल होत गेला, की अखेर मद्रासच्या पेण्टलंड गव्हर्नराने बेझंट, आरंडेल आणि वाडिया या तिघांना उटकमंड येथे `गुलिस्तान` नामक झोपडीत (जुलै १९१७) स्थानबद्ध डांबून ठेवले. इकडे लो. टिळकांनी तर काय, व्याख्यानांच्या दौऱ्यांनी सारा महाराष्ट्र, कर्नाटक, नागपूर प्रांतचसा काय, पण सिंध अजमेर दिल्ली कलकत्त्यापर्यंत घुसळून काढला.
बेझंट त्रयींच्या स्थानबद्धतेने सारा देश चवताळला. ही अटक होईपर्यंत हिंदुस्थानचे असे स्वतंत्र निशाण जन्माला आलेलेच नव्हते. उटकमंडच्या गुलिस्तान झोपडीवर लाल-हिरव्या रंगाचे एक रेशमी निशाण भारतीय होमरूल लीगचे राष्ट्रीय निशाण म्हणून फडकविले. मग हो काय ? साऱ्या हिंदुस्थानभर या निशाणाचा सर्वत्र फैलावा झाला. इतकेच नव्हे तर, लालहिरव्या किनारीची शुभ्र पातळे, चोळ्या, कोटाची बटणे, टोप्या, हातरुमाल, डायऱ्यांची कव्हरे, सारे सारे लाल-हिरवे झाले. काही महिलांनी तर कपाळच्या कुंकवाचा टिळा अर्धा लाल नि अर्धा हिरवा लावण्याचे धाडसही केले. लाल रंग हिंदूचा आणि हिरवा मुसलमानाचा, म्हणजे हिंदु-मुस्लीम ऐक्यावर राष्ट्रीय नेत्यांनी या वेळेपासून निष्ठेने जोर दिलेला होता. मुंबईत बेझंट बाईचे एकनिष्ठ थिऑसफिस्ट अनुयायी जगनादास द्वारकादास यांनी यंग इंडिया हे इंग्रेजी साप्ताहिक काढून, आंदोलनाचा जोर वाढविला.
मुंबईत बेझंटबाईच्या न्यू इंडिया दैनिकांच्या हज्जारो प्रती रोजच्या रोज संध्याकाळी मुंबईत बिनचूक यायच्या. मेडोज स्ट्रीट- हमाम स्ट्रीटच्या कोपऱ्यावर एक स्टेशनरी एजंटाचे दुकान होते. तेथेच फक्त हे दैनिक विकले जायचे. दुकानात समोरच पुरुषभर उंचीच्या पत्राच्या दोन रांगा उभ्या केलेल्या असत हापिसातून लोक सुटले का तेथे यायचे, खुशाल एक प्रत उचलायचे. जवळच ठेवलेल्या पेटीत एक आणा टाकायचे आणि जायचे. दुकानाचा व्यवस्थापक स्वतः विक्री न करता, नुसता पहात असायचा. मोड हवी असेल तरीही लोक खुशाल नाणे टाकून मोड घ्यायचे नि पत्र घेऊन जायचे. एकदा त्या दुकानदाराला मी विचारले, काय हो, पत्रखरेदीचा व्यवहार लोकच स्वतः करतात, तर काही फसवाफसवी तर नाही ना होत? मुळीच नाही." तो म्हणाला. "जितक्या प्रती तितके आणे बिनचूक पेटीत" असतात. आपले लोक चांगला प्रामाणिकपणा दाखवू लागले आहेत.
मुंबईत गुरुवार गाजू लागला
बेझंट, आरंडेल आणि वाडिया यांना ज्या दिवशी स्थानबद्ध करण्यात आले, तो गुरुवार होता. तेव्हापासून दर गुरुवारी सायंकाळी गिरगावातील चायनाबाग (आता शिक्कानगर) बंगल्याच्या पटांगणात जाहीर सभा भरू लागल्या. बेझंटच्या निशाणाप्रमाणे टिळकांच्या होमरूलने लाल-हिरव्या रंगाची निशाणे काढली. पण त्यातही पुणेरी मेख ठेवलीच, कॉन्स्टिट्यूशनल मार्गाने स्वराज्य मिळवायचे, हे होमरूल चळवळीचे जाहीर सूत्र होते. त्याला अनुसरून, टिळक-निशाणात दांडीच्या वरच्या कोपऱ्यात छोटेसे युनियन जॅकचे चित्र दाखविण्यात आलेले होते. यावर अनेक ठिकाणी आक्षेपाची कुरबूर चालू झाल्यावर लाल-हिरव्या रंगाचे एकठशी निशाण चालू झाले.
त्या आंदोलनाचा खरा प्रभावी जोर वाढविला, तो फक्त बेझंटच्या शाखेने त्यांचे नामांकित पट्टीचे वक्ते गावोगाव नि शहरोशहरी विखुरलेले असल्यामुळे, त्यांनी प्रचाराचा एकच गदारोळ उडविला. टिळकांच्या शाखेचा प्रभाव सिंध, गुजराथ वगैरे प्रांतांत मुळीच पडला नाही. महाराष्ट्रातही मुंबईत तर बेझंट पार्टीनेच सारे मैदान काबीज केले होते. बेझंट पार्टीने उभा हिंदुस्थान खवळून टाकला होता. चायना बागेतल्या गुरुवार सभांना बहुतेक नामांकित वक्ते थिऑसफिस्टच असत. या सभांना हजर राहण्यासाठी पुष्कळ नोकरमाने लोक, काही ना काही सबबी सांगून. हापिसातून लवकर पळायचे. मीही त्यातलाच एक होतो.
पण माझे तंत्र न्यारे होते. जिव्हाळयाचे राजकारण असो, वा समाजकारण धर्मकारण असो. नामांकित वक्त्यांची भाषणे रिपोर्ट करण्याची मला यावेळी आणखी चांगली संधी लाभली होती. दर गुरुवारी डोके दुखत आहे `या सबबीवर मी मलबार हिलवरील माझ्या हापिसातून पसार होत असे. ५-६ वेळा ती माझी डोकेदुखी सफाईत पचली गेली. पण एका गुरुवारी साहेबाने बोलावून विचारले, "काय रे, प्रत्येक गुरुवारलाच डोकेदुखी नेमकी कशी उपटते?" आता मात्र खरे सांगून मोकळे व्हायचे मी ठरविले आणि खरी वस्तुस्थिती सांगितली. "आस्सं. म्हणजे तू फक्त रिपोर्टिंगची प्रॅक्टिसच करायला जातोस ना? का, होमरूलर म्हणून? तसे नसेल तर अगत्य जात जा. दर गुरुवारी मला चिठ्ठी लिहिण्याचे कारण नाही." हा मुंबई सरकारचा इलेक्ट्रिकल इंजिनियर मि. विल्यम स्टुअर्ट मेंटिथ मोठ्ठा खवड्या असामी होता. पण खरे बोलले तर सुतासारखा सरळ असे.
शौकच्या शौक नि वर कमाई
गुरुवार सभांना वृत्तपत्रांचे नि सरकारी रिपोर्टर तांड्याने हजर असायचे, सरकारी वृत्तलेखकांशिवाय, बाकीचे उगाच अधूनमधून काही वाक्ये टिपून घ्यायचे नि बहुतेक वेळ भाषणे ऐकत बसायचे. मी मात्र शब्दशः लिहून घेण्यात व्यग्र असे. एक दिवस माझी आणि दोन-तीन सकाळ-सायंकाळवृत्तपत्र लेखकांची (गुजराथी पारशी) जानी दोस्ती जमली, "हे पहा ठाकरे, तुम्ही शब्दशः भाषणे टिपून घेता नि देत नाही कुठच्याही पत्राला. मग आम्हांला का देत नाही? द्याल तर आम्ही देत जाऊ रुपया दीड रुपया तुम्हाला दर वेळेला." मुंबई समाचार, अॅडव्होकेट ऑफ इंडिया, कायसरे हिंद, या पत्रांच्या रिपोर्टरांशी प्रत्येकी दोन रुपये दराने सौदा ठरला. पण ध्यनिलिखित मजकूर शब्दलिखित आणि तो जेव्हाच्या तेव्हा करणार कसा? टाइपरायटरशिवाय भराभर कार्बन प्रती निघणार कशा? एकाने ती सोय केली.
तो बरोबर छोटा ब्लिक टाइपरायटर घेऊन यायचा. सभा आटोपली की आम्ही चौघे प्रार्थना समाजसमोरच्या कुळकर्ण्यांच्या हॉटेलात जाऊन बसायचे. एकीकडे भजी तळणाच्या चुल्हाणाचा धगधगता शेक. आम्हांला शेकीत आहे. मी टाइपिंग करीत आहे आणि बाकीचे तिथे लेकाचे भजी बटाटे पोहे बकाणीत आहेत, असा देखावा व्हायचा. चुल्हाणाच्या धगीला कंटाळून आम्ही अखेर कै. द्वारकानाथ वैद्य (संपादक सुबोध पत्रिका) यांच्या परवानगीने प्रार्थना समाजाच्या हॉलमध्ये ठाण मांडू लागलो. दर आठवड्याला अयाचित सहा रुपये प्राप्ती होऊ लागली. होमरूल लीग आंदोलनाचा माझ्या संसाराच्या स्वराज्याला हा काय थोडा फायदा म्हणायचा?
प्रकरण ११
हयातभर लागलेले माझे दुर्दम्य व्यसन
या व्यसनापायी पुष्कळ वेळा सांसारिक अडचणी उत्पन्न झाल्या नि होत असत, पण ते न सुटता उलट वाढतच गेले. ते व्यसन मी सोडावे, म्हणून मात्र एकाही स्नेह्याला आणि घरातील आजी, आई नि पत्नी यांना सांगावे ना. त्या व्यसनाबद्दल अनेक स्नेह्यांना माझा अभिमानच वाटायचा. त्याविषयी ते अनेकांजवळ माझ्या व्यसनाविषयी गौरवपर उद्गार काढायचे. हातात महिन्याचा पगार आला का त्या व्यसनापायी त्यातला किती भाग खलास होतो नि किती सुखरूप घरी येऊन पत्नीच्या हातात पडतो, याची आई आजीला पहिल्या तारखेच्या सुमाराला काळजी वाटायची. माझ्या हापिसात महिपतराव तावडे हेड ड्राफट्स्मन होते आणि ते दादरला कुंभारवाड्यात रहात असत. दर पहिल्या तारखेला आजी मला न कळत अगदी सकाळीच तावड्यांकडे जायची नि सांगायची, "हे बघा महिपतराव, आज पहिली तारीख. पगार होणार, तेव्हा दादाला गप्पा गोष्टीत गुंगवून गिरणढोळा (ग्रांटरोड) कडूनच घरी घेऊन या. गिरगांवकडे जाऊ देऊ नका." आजीचे हे गुपित महिपतरावांनी आजी वारल्यावर आम्हा सगळ्यांना सांगितले. तावड्यांची युगत नेहमीच यशस्वी होत नसे. बहुतेक मलबार हिल उतरून विल्सन कॉलेजपाशी आलो का सटकलोच सॅण्ढर्स्ट पुलावरून लॅमिंग्टन रोडवरच्या माझ्या `पिठ्यात.` `पिठा` हे नाव आजी आईनेच दिलेले होते. पहिल्या तारखेला घरी यायला उशीर झाला का त्या म्हणत, "सटकलाच अखेर आपल्या पिठ्याकडे."
ते माझे हयातीला चिकटलेले व्यसन म्हणजे बुकबाजी उर्फ ग्रंथसंग्रह. या व्यसनापायी मी शेकडो रुपयांची खैरात केली. तो माझा `पिठा` म्हणजे (त्याकाळी) लॅमिंग्टन रोडवर असलेले मे. एस. गोविंद अॅण्ड सन्स् बुकसेलर्स यांचे दुकान. तेथे विलायत अमेरिकेतून दर आठवड्याला नानाविध विषयांवरील लहानमोठे ग्रंथ विक्रीला येत असत. माझ्या बुकबाजीच्या व्यसनावर गोविंदराव, का कोण जाणे, फार सहानुभूतीने पहायचा. दुकानात पाऊल पडताच नवनवीन महत्त्वाच्या ग्रंथांचा मला परिचय करून देण्यासाठी तो स्वतः, इतर गिऱ्हाइकांना असिस्टंटांच्या स्वाधीन करून झगडायचा. मी एखादा किंवा काही ग्रंथ निवडले का "ठीक आहे, घेऊन जा", सांगायचा. महिन्यातून किती का रुपयांची खरेदी होईना, पगाराच्या दिवशी "काय, गोविंदराव, किती झाले बिल?" म्हणून विचारले का ठरावीक उत्तर यायचे, "किती का असेना, तुम्हाला त्याची पंचाईत कशाला? सवडीने द्यायची असेल तेवढी रकम द्या, जमा होईल." २०, २५, ३० रुपये देतानाही पुन्हा नवीन ग्रंथांची खरेदी असायची. ग्रंथाची किंमत किती का असेना, उपयुक्त वाटला का घेतलाच तो. खाण्यापिण्याच्या व कपड्यालत्त्यावरच्या खर्चापेक्षा दसपट खर्च मी बुकबाजीच्या व्यसनापायी नेहमीच करीत असे. संदर्भासाठी अमुक ग्रंथ हवा म्हणजे हवाच. तेथे विलंब चालायचा नाही. हापिस सुटायची थांतड का धावलोच मी माझ्या पिठ्याकडे. त्यांच्याकडे तो ग्रंथ नसला तर दुसरीकडून मागवायचा, नाहीतर चक्क लंडन किंवा अमेरिकेतून मागविण्याची आरडर नोंदवायची. या परिपाठामुळे, माझे खाजगी ग्रंथालय म्हणजे म्हणाल त्या विषयावरचे जागतेज्योत संदर्भालय बनलेले असायचे. ऋग्वेदिक लिटरेचर, ऐतिहासिक ग्रंथ, अमेरिकन रॅशनल पब्लिकेशन सोसायटीचे सर्व वाङ्मय, तत्त्वज्ञान, इंग्रेजी काव्ये, किती यादी देणार? मात्र कादंबऱ्या, कथा, नाटके यांना मी कटाक्षाने टाळीत आलो आहे. सामान्यतः माझ्या संग्रही सातआठशे जगविख्यात प्राचीन, अर्वाचीन, पौर्वात्य, पाश्चात्य ग्रंथकारांचे ग्रंथ हमखास संदर्भ आणि अभ्यासासाठी तयार असत. अनेक लेखक नि तत्त्वशोधक गृहस्थ वरचेवर संदर्भासाठी माझ्याकडे येत असत. त्यांत प्रमुख म्हणजे महाडचे कै. प्रो. गोविंदराव टिपणीस. ते आले रे आले का त्यांची पहिली झडप पुस्तकांच्या कपाटावर, "काय बोवा, काय नवीन संग्रह आलाय आता", असे म्हणत तात्काळ ते पुस्तकांच्या राशीजवळ बसूनच चहा प्यायचे नि वाचनात गढून जायचे.
उडॉल्फ रॉथच्या ग्रंथासाठी बडोद्याची सफर
ऋग्वेदाविषयी कै. रा. ब. शंकर पांडुरंग पंडितांच्या `वेदार्थ यत्न` मासिकाने मला प्रथम चटक लावली. या मासिकाचे काही तुरळक अंक ग्रांटरोडच्या एका जुन्या पुस्तकवाल्याच्या दुकानात आढळलें. ते खरेदी करून मी तद्विषयक इतर ग्रंथांच्या मागावर राहिलो. मॅक्समुल्लरचेही ग्रंथ मिळवले, तारापोरवाल्याच्या `आऊट ऑफ डेट` जुन्या ग्रंथसंग्रहालयात मला प्रो. राजाराम रामकृष्ण भागवत यांनी ऋग्वेदाच्या एका समासावर लिहिलेल्या इंग्रजी टीकेचे एक जुनाट फाटके पुस्तक हाती लागले. अभ्यास चालू असता, उडॉल्फ रॉथ या जर्मन चिकित्सकाच्या ऋग्वेदावरील इंग्रेजी कॉमेंटरीचा संदर्भ आढळला. सगळीकडे पुष्कळ तपास केला, पण तो ग्रंथ पहायलाही मिळेना. मिळत नाही म्हणजे क्या बात है.
त्याच सुमाराला पुण्यास डॉ. भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना झाली होती आणि मद्रासचे श्री. शामाशास्त्री एम. ए. यांचा `कौटिलियम् अर्थशास्त्रम्` हा (मूळ ताडपत्रावर लिहिलेला) संस्कृत ग्रंथ त्यांनी छापून समारंभाने प्रसिद्ध केल्याची हकिकत मी वर्तमानपत्रात वाचली होती. एक दिवस `एस. गोविंद` दुकानात जाताच, समोरच पसरून ठेवलेल्या पुस्तकात त्या पुस्तकाच्या इंग्रेजी भाषांतराचे जाडजूड पुस्तक सहज नजरेला पडले. तात्काळ ते माझ्या बॅगमध्ये गेले. त्याचाही अभ्यास चालू होताच, त्याचे मूळ संस्कृत पुस्तक पैदा करण्याचा आटापिटा चालू झाला. मुंबईच्या बुकसेलरांची दुकाने पालथी घातली. अखेर खुद्द शामाशास्त्रींनाथ मद्रासला लिहिले. "प्रस्तुत पुस्तकाच्या अवघ्या ५५० प्रती छापल्या होत्या. त्या भांडारकर संस्थेच्या स्थापनेच्या दिवशीच संपल्या. आता माझ्याजवळ एकही प्रत शिल्लक नाही", असे त्याचे उत्तर आले.
उडॉल्फ रॉथ आणि हा कौटिल्य, यांच्या शोधासाठी बडोद्याची सफर करण्याचा बेत ठरला. तेथील राजेशाही ग्रंथालयात हमखास त्या प्रती निदान पहायला तरी मिळतील, अशा उद्देशाने मी आणि सावलीसारखे अखंड माझ्या संगती असणारे स्नेही कै. शंकर सीताराम उर्फ बाबूराव बेंद्रे यांच्यासह बडोदा गाठला. तेथील मुख्य ग्रंथपाल कुडाळकर यांनी आमचे हार्दिक स्वागत केले आणि ते दोन्ही ग्रंथ आमच्या समोर आणून ठेवले. रॉथच्या ग्रंथातून काही तपशील लिहून घेतला. बेंद्रे डिक्टेट करायचा नि मी शॉर्टहॅण्डमध्ये लिहून घ्यायचा. दोन दिवस काम चालले होते. कौटिलियम् अर्थशास्त्रमची प्रत कसेही करून मिळवून द्या, अशी कुडाळकरांना विनंती करताच, त्यांनी ताडपत्री ग्रंथाचे वाचन-संशोधन करणाऱ्या मद्रासी शास्त्री मंडळींच्या टोळक्याच्या दालनात आम्हांला नेले. "हे पहा शास्त्री, हे आमचे मोठे अभ्यासू दोस्त आहेत. त्यांना शामाशास्त्र्याचे कौटिलियम अर्थशास्त्रमची संस्कृत प्रत हवी आहे. काय करता बोला?" मुख्यशास्त्र्याने माझे नाव पत्ता लिहून घेतला. "कधी परत जाणार तुम्ही मुंबईला? चार दिवसांनी ना? ठीक आहे. तुम्ही दादरला जाताच त्या पुस्तकाची व्हीपी घेऊन पोस्टमन तुमच्या दाराशी आलाच समजा." शास्त्रीबुवांचे आश्वासन घेऊन आम्ही चार दिवसांनी दादरला परतलो आणि घरात पाऊल ठेवताच सौभाग्यवतीने एक व्हीपी आल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी महिना दीड महिना सारखी पाठलाग करीत असलेली त्या ग्रंथाची प्रत एकदाची हाती आली.
अर्थशास्त्राच्या उपयुक्ततेची पहिली तुतारी
संस्कृत आणि इंग्रेजी अशी दोन्ही पुस्तके हाती लागताच माझा त्यांचा अभ्यास जोराने चालू झाला. शेकडो नोट्स लिहून काढल्या. इसवी सनापूर्वी अंदाजे साडेतीनशे वर्षांपूर्वी विष्णुगुप्त चाणक्याने लिहिलेला तो ग्रंथ. जवळजवळ इंडियन् पिनल कोडसारखा, पण त्यात तत्कालीन आर्य समाजाचे राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक जीवन कसे होते, याचे चित्र फारच मनोवेधी आढळले. नेहमीप्रमाणे गोविंदराव टिपणिसांची स्वारी येताच त्यांनी त्या पुस्तकावर झाप टाकली. इतकेच नव्हे तर ती माझ्या नोट्सच्या चोपड्यांसह ते घेऊन गेले. काय त्यावेळच्या माणसांची स्वाध्यायशीलता सांगावी? आम्ही सारेच ज्ञान-वेडे होतो. नानाविध ज्ञानकणांवर पाखरासारखी आमची झडप पडायची. टिपणिसांनी कौटिल्याच्या ग्रंथाचा चिकित्सक अभ्यास करून, गिरगावातील मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या दिवाणखान्यात त्यावर आठवडाभर व्याख्याने दिली. त्यांचा इंग्रेजी गोषवारा बॉम्बे क्रॉनिकलमध्ये दररोज येऊ लागला. मराठी व्याख्यानांचा रिपोर्ट त्या इंग्रेजी दैनिकात कसा काय येत गेला, ते आम्हाला कळले नाही. पण त्या प्रकाशनामुळे कौटिलियम् अर्थशास्त्राच्या ग्रंथाकडे एकदम सर्व महाराष्ट्राचे लक्ष वेधले. त्यानंतर अनेक मराठी ग्रंथकारांनी मराठी भाषांतराची पुस्तकें बाहेर काढली, तरी प्रथम तुतारी फुंकण्याचे श्रेय गोविंदराव टिपणिसांनाच दिले पाहिजे. त्यांनी त्या व्याख्यानाचे एक पुस्तकही प्रसिद्ध केले. राजकीय सामाजिक मतमतांतरांच्या सध्याच्या जमान्यातही या ग्रंथाच्या अध्ययन-अध्यापनाची उपयुक्तता विशेष महत्त्वाची ठरणार आहे. पण आजकालच्या रहस्यकथा-पौकिनांना, लघुकथा-वाचकांना आणि नवकाव्याच्या मुरंब्यांना हे कोणी सांगावे? खुद्द राजकीय क्षेत्रात पक्षबाजीची हुल्लड गाजविणारांचेही लक्ष त्याकडे नाही, तर इतरेजनांची कथा ती काय?
स्वाध्यायशीलतेचा सोस
विवाह झाला का स्वाध्याय होत नाही, असे अनेक म्हणतात. माझा अनुभव अगदी उलटा आहे. स्वाध्यायाची खरी ओढ मला विवाहोत्तरच लागली. दिवसाचा उदरभरणाचा खटाटोप आटोपला, रात्री भोजनोत्तर ११ वाजेपर्यंत गायनवादनाचा कार्यक्रम झाला, म्हणजे बिछान्यावर पडल्या पडल्या १२ ते १, तसाच जरूरीचा विषय असेल तर २ वाजेतोवर माझे वाचन अखंड चालायचे. अर्थात सकाळी ८ च्या आधी मी सूर्यवंशी उठणार कसा?
एकदा अचानक मला निद्रानाशाचा आजार जडला. झोपेची नि माझी गाठच पडेना. २-३ दिवस गेल्यावर, दादरचे त्याकाळचे (जिऊबाईच्या चाळीत रहाणारे) डॉ. अनंतराव रामचंद्र (हे माझे फॅमिली डॉक्टरच होते) यांना भेटलो. औषध चालू झाले. परिणाम काहीच नाही. झोप नाही तरी एरवीच्या उद्योगात थकवा मुळीच नाही. डॉक्टर म्हणाले, "निद्रानाशावर ब्रोमाइड देतात. त्याचा कमाल डोसही काम करीत नाही. आता माझा नाइलाज आहे. सायंकाळी थंड पाण्याने स्नान करीत जा, मस्तकाला ब्राम्ही तेल चोपडा नि पहा काही उपयोग होतो का." हाही प्रयोग ५-६ दिवस केला, काही फरक नाही.
निद्रानाशाचा फायदा घेतला पाहिजे
विचार केला. झोप येत नाही ना? न येऊ दे. बाकी प्रकृती ठाकठीक आहे. थकवा नाही. हापिसातले नि घरचे स्वाध्यायाचे, लेखनाचे काम पूर्वीसारखेच जोमदार चालू आहे. मग कराच कशाला झोपेची एवढी पर्वा? लागेल तेव्हा लागेल. तोवर शेक्सपियरचा अभ्यास पायाशुद्ध करावा. निश्चय झाल्याबरोबर एस. गोविंद कंपनीतून शेक्सपियरच्या नाटकांचा एक आकर्षक बांधणीचा सचित्र ग्रंथ आणि जेम डिक्शनरी आणली. मला फाटकी तुटकी पुस्तके आवडत नाहीत. उपयुक्त अशी जुनी पुस्तके हाती लागली तर ताबडतोब ती माझ्या नेह्मीच्या बाईंडरकडून बांधून घेत असे. शेक्सपियरचा रात्रंदिवस अभ्यास चालू झाला. शब्द अडला का डिक्शनरी. `गुड इंग्लिश` रचना आढळली का तांबडी रेघ आणि तात्त्विक विचार अथवा सुभाषित आढळले का निळी रेघ. या पद्धतीने अक्षरशः रात्र न् दिवस अभ्यास चालू केला. स्टेशनवर जाण्यायेण्याचा वेळ बाद केला तर गाडीत बसल्यावरही तो अभ्यास चालूच. त्यावेळी आग-गाडया होत्या आणि बीब्बीचे डबे `दस मानस बेसे` वाले होते. कोपऱ्यात जागा मिळताच ग्रंथ उघडून ग्रांटरोड येईतोवर वाचन एकतान चालू. सध्याच्या रेल्वे प्रवासातली झुंबड गर्दी त्यावेळी नसे, हेच मोठे भाग्य. हापिसात तरी काय? हेड स्टेनोग्राफर मी. हाताखाली आणखी दोन टायपिस्ट. सव्वा अकराला मशिन उघडून शेजारी चोपडी नि फौंटनपेन तयार ठेवले का आमचे शेक्सपियरचे वाचन झाले चालू. अधूनमधून अचानक बडेसाब, त्यांचा असिस्टंट किंवा इन्स्पेक्टर टेबलाजवळ यायचे नि "टेक डौन" म्हणत एखादे पत्र सांगायचे. तेवढे चोपड्यावर फोनोग्राफी चिन्हांनी उतरले का आमचा क्रम दोन वाजेतोवर पुढे चालू. दोन वाजता टिफिन रूम. चहा घेताना सर्व मंडळींबरोबर तीन वाजेतोवर गप्पासप्पा. तीन वाजता टेबलावर आले का मग मात्र रेमिंग्टन् फुलस्पीड चालू व्हायचा. पाच वाजण्याच्या आत टिपलेली नि लिहून आलेली किती का पत्रे असत ना, टाइप करून जिकडच्या तिकडे रवाना व्हायचीच. इलेक्ट्रिकल इंजिनियर टू बॉम्बे गव्हर्नमेंटच्या कचेरीत जोवर मी स्टेनोग्राफर होतो, तोवर दोन वाजेतोवर लेखन-वाचन हाच माझा कार्यक्रम, पाचसहा पुस्तकांचे लेखन असेच तेथे झालेले आहे. साहेब लोकांना हे माझे व्यसन माहीत होते, पण त्यांनी कधी आक्षेप घेतला नाही. रोजची कामे रोज यथासांग फडशा पडत गेल्यावर कोण कशाला आक्षेप घेणार?
पण स्वतःचा टाइपरायटर नाही हो!
दोनतीन महिन्यांनी झोप येऊ लागली. सहा महिने नाटके नि सॉनेटसह माझा शेक्सपियरचा अभ्यास अखंड चालू होता. इतकी तयारी झाल्यावर, एक दिवस कल्पना सुचली की निळ्या रेघांनी दर्शित केलेली शेक्सपियरची सुभाषिते नि तात्त्विक विचार यांची विषयवारी टिपणे तयार केली, तर एक चांगला इंग्रेजी संदर्भग्रंथ तयार होईल. हो, पण तो हातांनी किती लिहिणार? त्यासाठी टाइपरायटर पाहिजे. तो मिळणार कसा? तेथवर लहानसान टायपिंगची खाजगी कामे मी हापिसातल्या टाइपरायटरवर बदडीत असे. पण हे संकल्पित काम घरीच करावे लागणार. ७५ रुपये पगाराच्या असामीला मिळणार कसा टाइपरायटर?
इच्छाशक्तीपुढे अशक्य ते काय?
टाइपरायटरच्या विचाराने माझे सर्वस्व अगदी भारून गेले. मस्तकात दुसरा विचारच घुसेना. रात्री स्वप्ने पडायची ती सुद्धा त्याचीच. स्नेहीमंडळींशी बोलण्यातही त्याच्याच गोष्टी. निदान तीन महिने तरी मी त्यासाठी अगदी वेडा झालो होतो. इच्छाशक्ती सारखी उसळ्या मारीत होती. वामन पंडिताच्या "अहो येता जाता वदनि वदता ग्रास गिळिता" वचनाप्रमाणे माझी अवस्था झाली होती.
काही कल्पना नसताना, एका रविवारी कै. द्वारकानाथ राजाराम उर्फ बाळासाहेब वैद्य, आर्किटेक्ट इंजिनिअर (दादरच्या शिवाजी पार्कचे आद्य कल्पक) अचानक माझ्या बिऱ्हाडी आले. नीटनेटका, बिनचूक आणि पद्धतशीर टायपिस्ट म्हणून मुंबईतले पुष्कळ लोक मला ओळखत असत. लंडनच्या प्रीव्ही कौंसिलात त्यांच्या एका अशिलाचे अपिल जायचे होते. येथून से उत्कृष्ट टायपिंगने लंडनला जायचे नि तेथे त्याची छपाई व्हायची, अशी पद्धत होती. ते काम मी करावे म्हणून ते माझ्याकडे मुद्दाम आले. पण बाळासाहेब, मी म्हणालो, "माझ्याजवळ टाइपरायटर नाही. मग हे एवढे ३००-३५० फूल्स्कॅपचे टायपिंग मी करणार कसे?" निराश होऊन ते जिना उतरले. पण अचानक काहीतरी निश्चित बेत करून पटकन परत वर आले.
बाळा : हे पहा केशवराव, समजा टाइपरायटर मिळाला, तर टायपिंगचा तुमचा चार्ज काय होईल? निळे लेजर पेपर आम्ही देऊ. मूळ प्रत आणि एक कार्बन कॉपी. चार्ज बोला.
मी : दर पानी दोन रुपये. तीन ओळींची स्पेस.
बाळा : ठीक आहे. चला माझ्याबरोबर, साडेतीनशे पाने टायपिंग होणार म्हणजे तुमचे बिल रु. ७०० होणार. नव्या कोऱ्या यंत्राला काय पडते?
मी : तीन साडेतीनशे रुपयांत कोरोना छोटा टाइपरायटर मिळतो.
बाळा : ठीक आहे. सौदा ठरवा, मी ही रक्कम आगाऊ देतो तुम्हाला. मग तर हे काम द्याल ना?
तसाच गेलो गिरगावला आर्यन टाइपरायटर कंपनीत. एक कोरोना विकत घेतला, बाळासाहेबांना दाखवला. त्यांच्या कामाचे पुडके नि कोरोना घेऊन दादरला आलो. तीन महिने छळीत असलेल्या इच्छेची पूर्ती झाली. मला स्वतःच्या मालकीचा कोरा कोरोना टाइपरायटर मिळाला. अशक्य शक्य झाले. रोज रात्री २-३ तास श्रम करून त्यांचे काम १५ दिवसांत मनपसंत तयार करून दिले.
लागलो शेक्सपियरच्या मागे
हातांत हुकमी टाइपरायटर येताच, मी संकल्पित शेक्सपियर-सूक्ती टाइप करण्याच्या उद्योगाला लागलो. तीनचार महिने रोज रात्री आणि रविवार सगळा, बाबूराव बेंद्रे डिक्टेट करायचा नि मी टाइप करायचा; असा क्रम चालू झाला. दोघांनाही इंग्रेजी भाषेची उत्कृष्ठ कमावणी करण्याचा ध्यास होता. लहानमोठ्या डिक्शनऱ्या हाताशी तयार असायच्या, कारण एका इंग्रेज लेखकानेच सूचना दिलेली आम्ही तंतोतंत पाळली होती. ती अशी : "मेक डिक्शनरी युअर स्लेव्ह."
शेक्सपियर सूक्तीचे टाइप केलेले चोपडे घेऊन एस्. गोविंद कंपनीच्या गोविंदरावांना भेटायला गेलो. ते ग्रंथप्रकाशक होतेच. समजा, त्यांना नाही जमले, तर ते विलायतेला एखाद्या पब्लिशरकडे धाडतील, ही कल्पना. त्यांनी चोपडे चाळले आणि असिस्टंटला म्हणाले, "अरे, ते डॉड्ज् ब्यूटीज ऑफ शेक्सपियर` पुस्तक आण पाहू इकडे." पुस्तक माझ्या हातात येऊन ते चाळताच, मी थक्क झालो.
गोविंदराव : `केशवराव, वरमण्याचं कारण नाही. डॉड् आणि इतर विद्वानांनी शेक्सपियरची सुभाषिते एकत्र विषयवार तयार करण्याचे जे परिश्रम केले आहेत, तेच तुम्ही केलेत. हे काही कमी लेखण्यासारखे नाही. परिश्रमांची त्यांची नि तुमची पातळी एकच आहे. एवढे जबरदस्त परिश्रम तुम्ही केलेत, याबद्दल मला तुमचा खरोखरच अभिमान वाटतो. तुमच्या स्वाध्यायशीलतेची ही मख्खी जाणूनच माझे दुकान मी तुमच्या उपयोगासाठी मुक्तद्वार वापरू देत असतो. विचारलंय का कधी तुम्हाला बिलासाठी? नाही ना? अहो, आहेत कुठे असले अभ्यासू लोक? हे डॉड्ज् ब्यूटीज ऑफ शेक्सपियर मी तुम्हाला बक्षिस देत आहे."
ग्रंथलेखनाचा श्रीगणेशा
अनेक विषयांवरील संस्कृत, मराठी आणि इंग्रेजी ग्रंथांचा स्वाध्याय चालला असताना, वक्तृत्व विषयाकडे माझे लक्ष विशेष वेधले. अनेक नामांकित देशी परदेशी वक्त्यांची भाषणे मी ऐकत असे नि ऐकलीही होती. कित्येकांची तर ध्वनिलिखितही केलेली होती. प्रत्येकाची लकब निराळी. काही केवळ विद्वत्तेच्या प्रदर्शनासाठी बोलत, त्यांची व्याख्याने श्रोते पुराणिकाच्या ठरावीक धारणीसारखी फक्त भक्तिभावाने ऐकत. ऐकत म्हणजे काय? तर एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने बाहेर सोडीत. कसं काय झालं व्याख्यान? तर वक्ता विद्वान, विलक्षण अभ्यासू, आपल्याला काय समजणार त्यात, हा परिणाम. कित्येकांची भाषणे मधुरमधुर शब्दांचा नुसता सडा. श्रोत्यांनी नुसता तो ऐकावा नि कौतुक करीत सभागृहाबाहेर पडावे. कित्येकांचे भाषणापेक्षा हातवारेच जबरदस्त. असले नाना प्रकार पाहून वक्तृत्व-परिणामकारक वक्तृत्व-असावे कसे आणि ते कमावण्यासाठी उमेदवारांनी स्वाध्यायाची, आवाजाच्या कमावणीची, हावभाव नि मुद्राभिनयाची कसकशी तयारी केली पाहिजे, इत्यादी अनेक मुद्यांची मी ४-५ वर्षे टिपणे करीत होतो आणि त्याविषयीची पाश्चात्य पुस्तके अभ्यासीत होतो.
नवथर लेखकांच्या अडचणी
सन १९१४ ते सन १९१८ च्या दरम्यान `वक्तृत्वशास्त्र` या ग्रंथाचे लेखन पुरे झाले. ग्रंथलेखन झाल्यावर अर्थात त्याच्या प्रकाशनाचा प्रश्न दत्त म्हणून पुढे उभा ठाकतो. ग्रंथाच्या बऱ्यावाईट भविष्याची सूत्रे प्रकाशकाचा हातात असतात. तो नामांकित असला तर ते उजळ निपजते, असातसाच फालतू नि हंगामी असला का त्याचे, लेखकाचे नि पुस्तकाचे बारा वाजतात. प्रकाशक ग्रंथविक्रेताच असावा लागतो. नुसता प्रकाशक असून भागत नाही. प्रकाशन आणि विक्री असे दोन लगाम हाती असलेला सारथी शोधणे आणि शोधाची परमावधी करून तो लाभणे, हा लेखकाच्या चरित्रातील एक जुगारच म्हटला तरी चालेल. तशात लेखक नव्यानेच लेखनक्षेत्रात प्रवेश करणारा असला का त्याला अनेक मोकांडांना तोंड देण्याचा कडवा प्रसंग ठेवलेलाच. वृत्तपत्री लेखनामुळे मी एक कडवट आणि नाकावर माशी बसू न देणारा फटकळ लेखक म्हणून माझ्या नावाचा डंका वाजलेला. अशा माणसाचा ग्रंथ छापायला घ्यायचा तर तो प्रथम जो तो (ग्रंथ न उघडताच) यात कोणाच्या बिनपाण्याने तर नाही ना केलेल्या? हा प्रश्न बिनचूक टाकायचा.
दोन जिव्हाळ्याच्या स्नेह्यांची गाठ
खूप विचार करून मी पुण्याला गेलो. त्यावेळी मोरोपंतांचे वंशज पंत पराडकर यांनी मोरोपंतांच्या अस्सल चोपड्यांवरून त्यांचे सारे ग्रंथ प्रकाशित करण्याचा उद्योग चालवला होता. आर्याभारत आणि रामायणे छापली गेली होती. काय वाटले कोणास ठावे, मी पंत पराडकरांच्या सदाशिव पेठेतल्या बिऱ्हाडी जाऊन त्यांना भेटलो. माणूस मोठा निगर्वी नि आल्यागेल्याचा जिव्हाळ्याने आदर राखणारा. वक्तृत्वशास्त्राचे जाडजूड चोपडे मी त्यांच्या हातांत ठेवले. "वा वा, आपण हा चांगला विषय हाती घेतला. मराठीत या विषयाचा सांगोपांग विचार कोणीतरी करायला हवाच होता. सध्या मीच माझ्या मोरोपंती प्रकाशनाच्या ओझ्याखाली वाकलो आहे. पण चोपडे ठेवा दोन दिवस माझ्यापाशी. वाचतो. काढू काहीतरी मार्ग प्रकाशनाचा", असा पंतांनी मला दिलासा दिला.
तिसऱ्या दिवशी स्वतः पंतच चोपडे घेऊन समर्थांच्या वाड्यात माझा शोध घेत आले. "हे पहा केशवराव, ग्रंथ फार छान आणि सध्याच्या काळाला अगदी उपयुक्त आहे. हा छापला गेलाच पाहिजे. चला उठा. आपण आत्ताच्या आत्ता आमच्या त्या दत्तोपंत पोतदारांना जाऊन भेटू. दत्तोपंत म्हणजे आमच्या पुण्याचे एक उमलते मोगऱ्याचे फूल आहे फूल."
आम्ही दोघे दत्तोपंताकडे गेलो. पंत पराडकरांनी माझी आणि वक्तृत्त्वशास्त्र चोपड्याची स्वतःच इतकी प्रस्तावना केली की तितकी मलाही साधली नसती. पंतांचे प्रस्तावना पुराण चाललेले होते आणि दत्तोपंत एकाग्र चित्ताने, पण मधूनमधून नुसता हुंकार देत, चोपड्यातील एकेक प्रकरणाचे नेत्र-वाचन करीत होते. सुमारे एक तास असा गेल्यावर दत्तोपंत म्हणाले, `अहो असले उपयुक्त पुस्तक आमच्या काका जोश्यांनीच छापायला घेणे जरूर आहे. चला, आपण आत्ताच जाऊ त्यांच्याकडे. (माझ्याकडे वळून) भलतीच मेहनत घेतली आहेत हो या पुस्तकासाठी. चला."
आम्ही तिघे चित्रशाळेत गेलो. दत्तोपंतानी नि पराडकरांनी काकांना माझा नि पुस्तकाचा मनस्वी शिफारशीने परिचय करून दिला.
काका : तुम्हा दोघांची एवढी शिफारस असल्यावर हो काय? छापतो.
सहा महिन्यांच्या अवधीत वक्तृत्वशास्त्र पुस्तकाची छपाई झाली. कव्हरावरचे, विवेकानंदांचे (भाषण करीत असल्याचे) भव्य चित्र आणि आतील चित्रांची सजावट (त्यावेळचे) चित्रशाळेचे कलाकार श्री. जुवेकर यांनी केली.
लोकमान्यांची नि माझी पहिली भेट
पुस्तकाचा शेवटला फार्म छापण्यापूर्वी काही अधिक मजकुराची जरूर आहे, अशी काका जोश्यांची तार आल्यावरून मी सकाळच्या पुना एक्सप्रेसने पुण्याला गेलो. स्टेशनवरून तडक चित्रशाळेत गेलो नि मजकूर दिला. त्याच वेळी लोकमान्य तेथे आले होते. काकांनी त्यांचा नि माझा परिचय करून दिला. "बळवंतराव, आपल्याकडे वक्तृत्वशास्त्र छापले जात आहे ना, त्याचे लेखक हे ठाकरे." मी लोकमान्यांना नमस्कार केला.
टिळक : उत्तम पुस्तक लिहिले आहे तुम्ही.
मी : आपण कधी पाहिले? पुस्तक अजून बाहेरही पडले नाही.
टिळक : अहो, पाहिल्याशिवाय का मी बोलतो? पुस्तकाच्या प्रत्येक फार्माचा प्रूफ काका आमच्याकडे दाखवायला आणतात ना. पहातो सवडीने चाळून.
मी : आपल्यासारख्यांचा आशीर्वाद असल्यावर--
टिळक : मी देणार आहे अभिप्राय (थोडा वेळ थांबल्यावर) आपण कोण, देशस्थ का?
मी : नव्हे, कायस्थ.
टिळक : अस्सं. तरीच. तुम्ही कायस्थ म्हणजे पूर्वापार कलमबहाद्दर, ती चमक आहे तुमच्या पुस्तकात.
अभिप्रायासाठी आगाऊ प्रती
लोकमान्यांचा अभिप्राय कळल्यामुळे, काका जोश्यांना खूप अवसान चढले. काही ज्येष्ठ श्रेष्ठ लोकनेत्यांचे आणि विद्वानांचे अभिप्राय आगाऊ मिळवून ते पुस्तकात छापण्याची त्यांनी योजना केली. त्यासाठी १२-१५ प्रती कापडी बाईंडिंगच्या तयार करून मला दिल्या नि काही पोष्टाने पाठवून अभिप्रायाची विनंती केली. त्याप्रमाणे अभिप्राय आले त्यांची नावे - (१) बॅरिस्टर जयकर (इंग्रेजी), (२) काशीबाई हेरलेकर, (३) रा. ब. चिंतामणराव वैद्य, कल्याण, (४) रायबहाद्दूर भाईसाहेब गुप्ते, कलकत्ता, (५) रा. ब. विष्णू मोरेश्वर महाजनी, अकोला, (६) रा. सा. गो. वा. कानिटकर, पुणे, (७) श्रीमज्जगद्गुरू शंकराचार्य पीठ करवीर, (डॉ. कूर्तकोटी कोल्हापूर, (८) डॉ. खेडकर एम्. डी. कोल्हापूर, (९) प्रो. शिवरामपंत परांजपे, पुणे. प्रश्न राहिला लो. टिळकांचा. त्यावेळी ते चिरोल केससाठी लंडनला जाण्याच्या गडबडीत होते. एलफिंस्टन रोडवरील एका गिरणीच्या मैदानांत त्यांचे व्याख्यान होते. दादरचे माझे दोस्त कै. पांडोबा सहस्त्रबुद्धे यांच्या बरोबर मी दोन प्रती त्यांना देण्यासाठी पाठविल्या. लोकमान्यांचा निरोप आला की, "प्रती मिळाल्या. बोटीवर निवांतीने वाचून अभिप्राय कळवितो."
केसरीत केळकरांची लंडनची पत्रे येत, पण अभिप्रायाचा पत्ता नाही. एक दिवस सहज गिरगावात गेलो असतां, बॅकरोडवरील कीर्तन विद्यालयात गीतावाचस्पती भिडे (अंध) यांना भेटण्यास गेलो. मी आलो आहे असे समजताच ते उमाळयाने म्हणाले--"अहो ठाकरे, तुमच्या वक्तृत्त्वशास्त्रावर लोकमान्यांचा अभिप्राय आला आहे. पहा आमच्या कीर्तन मासिकाचा ताजा अंक.” भिडे शास्त्र्यांनी लोकमान्यांना लिहिले होते की वक्तृत्वावर काही इंग्रेजी पुस्तकें असतील तर ती पाठवावी. त्यावर लोकमान्यांचे त्यांना उत्तर आले की, "इकडील पुस्तकांचा कीर्तनाच्या कामी तादृश काही फायदा होणार नाही. तुम्ही आपल्या रा. रा. काका जोश्यांनी छापलेले ठाकरे यांचे वक्तृत्वशास्त्र पुस्तक अभ्यासक्रमात ठेवावे."
वक्तृत्वशास्त्राची अर्पणपत्रिका
माझा पहिलावहिला ग्रंथ (प्रसिद्धी ता. १३ मे सन १९१८. अक्षयतृतीया शके १८४०). त्याला थोर विद्वानांच्या अभिप्रायांचे आशीर्वाद, चित्रशाळेचे प्रकाशन, आणि या सगळ्या भाग्याचे श्रेय दत्तोपंत पोतदार आणि पंत पराडकर यांचे. "ग्रंथार्पण कोणाला करणार केशवराव?" दत्तोपतांचा प्रश्न. "महाराष्ट्रीय बंधू भगिनींना", माझा जबाब. दत्तोपंत खुष झाले नि माझ्या पाठीवर शाबासकीची जोराची थाप मारली.
विविध वादांच्या जंगलात प्रवेश
काळ एकरूप रहात नाही. तो सारखा बदलत असतो आणि त्याच्या बदलत्या पावलांबरोबर लोकांचे आचार, विचार नि उच्चारही बदलत असतात. समाज आज ज्या आचार विचारांच्या अवस्थेत आहे तसा तो ५० वर्षांपूर्वी खास नव्हता. अर्ध शतकापूर्वीच्या समाजवस्थेचे यथातथ्य चित्र चालू जमान्यातल्या मंडळींपुढे धरले, तर "पूर्वी आपण खरोखरच इतके नादान होतो काय?" अशा संभ्रमाच्या धुक्यात क्षणभर ते वावरतील. साशंक होतील, आणि कदाचित त्या चित्रकारावर संतापाने भडकतीलही. सतीचा धर्ममान्य आणि लोकमान्य प्रघात, तरुण विधवांचे जबरदस्तीचे केशवपन, जरठ-बाला विवाह, इत्यादी लोकाचारात चालू असलेल्या रानटी रूढींचा इतिहास आज वाचला, कोणी सांगितला अथवा लिहिला, तर आजच्या मंडळींना काय वाटेल, हे ज्यांनी त्यांनी आपल्या आत्मारामाला विचारावे. आज आपण त्या सर्व रूढींचा नायनाट करून एका नव्या विवेकवादी मन्वंतरात वावरत आहोत. तरी पण तो इतिहास आणि त्यातली सत्ये कोणालाही तुंकाराने नाकारता येणार नाहीत. किंवा त्यांचे कथन कोणी केल्यास, संतापाने नाके फेंदारण्याचेही कारण नाही.
सन १९१८ पासून माझ्या खऱ्याखुऱ्या सार्वजनिक जीवनाला प्रारंभ झाला. लोकहितवादी, आगरकर, ज्योतिबा फुले, इंगरसॉल इत्यादी नवमतवादी क्रांतिकारकांच्या ग्रंथांचा माझा अभ्यास परिपूर्ण होऊन, त्या चष्म्यातून माझे समाजनिरीक्षण काटेकोर चालू होते. मुंबई शहरात पूर्वीपासूनच कॉस्मॉपोलिटन स्पिरिट असल्यामुळे, अनेक सामाजिक अन्यायांची नांगी फारशी कोणाला टोचत बोचत नसे. बाहेरगावी, विशेषतः खेड्यापाड्यात, अस्पृश्यता जेवढी कटाक्षाने पाळली जात असे, तेवढी मुंबईत नसे. तरीही होलिका संमेलनात त्यांना मिळून मिसळून घेताना, लोकमताला कुरवाळताना कार्यकर्त्यांना फार परिश्रम करावे लागत असत. अस्पृश्यांचीच गोष्ट कशाला? ब्राह्मणेतरांनाही ब्राह्मणांकडून शिवाशिवीची अनेकमुखी अपमानास्पद वागणूक सहन करावी लागत असे. ब्राह्मणेतराला, अगदी कायस्थ प्रभूंसारख्या संस्कृतीने, शिक्षणाने, आचारविचाराने समतोल असणाऱ्या मंडळींना, कधीकाळी ब्राह्मणांकडे जेवणाचा प्रसंग आला तर त्यांची पाने ब्राह्मणांच्या पंगतीपासून लांब दूर खालच्या ओटीवर मांडली जात असत आणि वाढण्याचे पदार्थ उंचावरून टाकण्यात येत असत. असले अनेक अनुभव मी स्वतः घेतलेले आहेत. अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाची कथा काय, पण कित्येक देवळांत ब्राह्मणेतरांनाही कडक मज्जाव असे. सन १९२० साली मुंबईचे काही दैवज्ञ नरसोबाच्या वाडीला दर्शनासाठी गेले होते. तेथल्या बडव्यांनी त्यांना गाभाऱ्यात जाण्याला कडवा विरोध केला. इतकेच नव्हे, तर तो वाद मुद्यांवरून गुद्यांवर जाऊन दैवज्ञ मंडळींना बडव्यांनी प्राणांतिक बडवले. ती फिर्याद करवीर दरबारात गेली. ब्राह्मणेतर राजाच्या दरबारात ब्राह्मणांना न्याय मिळणार नाही, या संभाव्य आक्षेपाला प्रथमच निरूत्तर करण्यासाठी, छत्रपती महाराजांनी हायकोर्ट जज्ज मि. सी. ए. किंकेड यांना त्या खटल्याचे न्यायमूर्ती म्हणून मुंबई सरकारकडून मागवून घेतले. आठवडाभर खटला चालून, बडव्यांना सश्रम कारावासाची शिक्षा झाली. या खटल्यात दैवज्ञ फिर्यादींनी ऐतिहासिक पुरावा म्हणून "ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास" हा माझा ग्रंथ दाखल केला होता आणि तो आधारभूत नि विश्वसनीय म्हणून न्यायाधीशांनी मान्यही केला होता. सारांश, त्याकाळी ब्राह्मणवर्गाचे सामाजिक व धार्मिक वर्चस्व अगदी कडेलोटाला गेले होते.
बहुजन समाज तर कोरा करकरीत निरक्षर. यातून भटभिक्षुकांकडून त्यांची अनेकमुखी पिळवणूक बिनधोक चाललेली. वर्तमानपत्रे एकजात ब्राह्मण मंडळींच्या हाती असल्यामुळे, हव्या त्या मुकाबल्याचा कांट्याचा नायटा करणे, त्यांची सहज लीला होऊन बसली होती. माझा पिण्ड राजकारणी नसून समाजकारणी, सामाजिक उत्क्रांतीशिवाय राजकारणी क्रांती फोल, हा माझा मनोमन रुजलेला सिद्धान्त आजही कायम आहे. स्वराज्य येऊन २५ वर वर्षे लोटली, तरी लोकांना सुराज्याची चव काय ती ठावी नसावी, यातच माझ्या त्या सिद्धान्ताचे सत्य सिद्ध होत आहे. ब्राह्मणेतरांचे आंदोलन म्हणजे काही उपटसुंभांचे अनाठायी बंड, असा समज आजही असणारांनी विख्यात समाजशास्त्रज्ञ डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांनी त्या वादाची केलेली मिमांसा आजही विचारात घ्यावी.
तपहीन ब्राह्मण
या मथळ्याखाली महाराष्ट्र-जीवन (भाग १ ला, पान ३१३-१४) ते लिहितात-
"लोकहितवादी, रानडे, आगरकर यांनी समतेचे जे तत्त्वज्ञान सांगितले व समाजसुधारणेची जी इतर तत्त्वे सांगितली त्या अन्वये ब्राह्मणांची मनःक्रांती झाली असती तर हा अनर्थ (ब्राह्मण-ब्राह्मणेतर) बव्हंशी टळला असता असे वाटते. पण तसे झाले नाही. ब्राह्मण हा राजकीय क्रांतीला उन्मुख झाला. त्या क्रांतीसाठी त्याग, तपश्यर्चा, देहदंड, आत्मबलिदान हे मोल देण्यास तो सिद्ध झाला. पण वर्णाभिमान, जातीय श्रेष्ठतेचा अहंकार नष्ट करून बहुजन समाजाशी एकरूप होण्यास मात्र तो त्यावेळी सिद्ध झाला नाही. खेड्यापाड्यांतील बहुजन समाजाच्या डोळ्यांपुढे नित्य उभा असणारा ब्राह्मण हा वरील श्रेष्ठ गुणांनी संपन्नही नव्हता. सावकार, कुळकर्णी आणि भिक्षुक ही त्रयी खेड्यापाड्यांतील ब्राह्मणेतर समाजापुढे नित्य उभी होती. तिच्या अंगी ब्राह्मण्याचे कसलेही श्रेष्ठ गुण नव्हते. शुचिता, परोपकार, विद्योपासना, भूतदया, त्याग, समाजहितबुद्धी या गुणांचा लवलेशही तिच्या ठायी नव्हता. स्वार्थ, लोभ, पापवासना, असत्य अमंगल वाणी, कारस्थानी वृत्ती हे सर्व तामस गुण तिच्या ठायी ओतप्रोत होते. आणि असे असूनही `आम्ही ब्राह्मण सर्व वर्णाचे गुरू आहो, ब्राह्मणेतरांपेक्षा श्रेष्ठ आहो`, असा अहंकाराचा उग्र दर्प, अगदी दुर्गंधी येण्याइतका दर्प, त्यांच्या ठायी होता. हळूहळू जागृत होणाऱ्या ब्राह्मणेतरांना हा जातीय श्रेष्ठतेचा जुलूम असह्य वाटू लागला. आचारभ्रष्ट, स्वार्थी, अशुचि, द्रव्यलोनी, विद्याहीन, कळाहीन ब्राह्मणांच्या जातीय श्रेष्ठतेच्या भावनेचा त्यांना संताप येऊ लागला. त्यातच वकील, सावकार व कुळकर्णी हा वर्ग इंग्रजी राज्याच्या भक्कम चौकटीच्या आश्रयाने श्रीमंत झाला आणि शेतकरी असह्य करांच्या ओझ्यामुळे दरिद्री होत चालला. आणि त्यांच्या जमिनी हळूहळू वरील तिघांच्या घरांत गेल्या. हे सर्व कायद्याच्या आश्रयानेच चाललेले होते. आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करणारे न्यायाधीश, शिरस्तेदार, मामलेदार, फौजदार, बेलीफ हे सर्व बहुधा ब्राह्मणच होते. त्यामुळे आपली सर्व बाजूंनी नागवणूक करून आपली अन्नान्नदशा करून टाकण्यास हा ब्राह्मणच कारणीभूत आहे असा दृढ समज बहुजन समाजाच्या मनात घर करू लागला. कोणाच्याही देशाच्या राज्यकारभाराच्या यंत्रणेवरील सर्व प्रकारचे लोक असतातच. आणि ते बहुजन समाजाची अशीच पिळवणूक, असेच रक्तशोषण करीत असतात. आणि यातून वर्गकलह निर्माण होतो. पण महाराष्ट्रात वरील अधिकारी सर्वत्र ब्राह्मण जातीचे असल्यामुळे, येथे जातीय कलह निर्माण झाला. या ब्राह्मणांच्या मनात नवे सामाजिक तत्त्वज्ञान रूजून, त्यांचे मतपरिवर्तन होऊन, त्यांच्या जातीय अहंकाराचा दर्प कमी झाला असता, आणि ते मतपरिवर्तन त्यांच्या आचरणात दिसले असते तरी विषमतेची तीव्रता बरीच कमी झाली असती. पण तसे मुळीच झाले नाही. जप, त्याग, अध्ययन, अध्यापन, शुचिर्भूतता, विवेक, संयम या गुणांचा वारस नसूनही ब्राह्मणेतरांना ते हीन लेखीत, त्यांचा विटाळ मानीत. मग त्यांच्यात मिसळणे, त्यांच्या पंक्तीला खाणे पिणे, त्यांच्याशी समरस होणे हे त्यांच्या स्थानी आले नाही तर नवल काय? महाराष्ट्रातील ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर समाज एकमेकांपासून दुरावले. त्यांच्यातील विषमता उत्तरोतर तीव्र होत चालली आणि त्यामुळे त्यांच्यातील वैराग्नी भडकून पुढे त्याचे अत्यंत अनर्थकारक परिणाम झाले त्याची कारणे ही अशी आहेत."
प्रतिकाराचा माझा निर्धार
वयाच्या आठव्या वर्षीच अस्पृश्यता-विध्वंसनाचे बाळकडू माझ्या आजीनेच पाजले होते. ती हकिकत मागे आलीच आहे. डॉ. सहस्रबुद्धे यांनी अत्यंत निस्पृहपणे वर्णन केलेल्या सामाजिक अन्यायांना प्रतिकार करण्याचा माझा निर्धार बळावला. मी चांगला वक्ता आहे. खंबीर लेखक आहे, समाजातले अन्याय मी उघड्या डोळ्यांनी पहात आहे, बहुजन समाजाच्या बाजूने लिहिणारा बोलणारा खमक्या वक्ता लेखक कोणीही नाही, मी स्वस्थ का बसावे? याच सुमाराला जातिवर्चस्वाच्या दंभाने तर्र झालेल्या काही विद्वान ब्राह्मणश्रेष्ठींनी पांढरपेशा ब्राह्मणेतर जमातींना आणि काही ब्राह्मण जातींनाही क्षुद्रत्वाच्या, किंबहुना शूद्रत्वाच्या खायीत ढकलून, त्यांना हिंदु समाजात बदनाम करण्याचा विद्वत्ताप्रचुर चंग बांधला. म्हणजे खेड्यापाड्यांतल्या बहुजन समाजाच्या चुरडणी भरडणीच्या जोडीने शहरांत वावरणाऱ्या पांढरपेशा जमातींना सामाजिक हीनत्वाने लेखण्याच्या चिथावणीचा उद्योग चालू झाला.
राजवाडे प्रकरण
कै. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे म्हणजे मऱ्हाठी इतिहास संशोधनातले महान अध्वर्यू. त्यांच्या तपश्चर्येबद्दल इतरांप्रमाणेच मलाही मोठा अभिमान नि आदर. त्यांच्या निर्णयाविरुद्ध ब्र काढण्याची महाराष्ट्रात कोणाही विद्वान पंडिताची छाती नसे. त्या राजवाड्यांना जातिवर्चस्वाचे भूत झोंबले आणि त्यांनी सातारा गळाठ्यातील एका कागदावरून, चांद्रश्रेणीय कायस्थ प्रभू जमातीवर, भारत इतिहास संशोधन मंडळाच्या चवथ्या वर्षाच्या अहवालात, खालील चार ठळक आरोप केले.
(१) संभाजीचा खून व तत्कालीन क्रांती कायस्थांमुळेच घडून आली.
(२) नारायणराव पेशव्याच्या खुनात कायस्थांचे अंग होते.
(३) सातारच्या महाराजांच्या वतीने दुसऱ्या बाजीरावाच्या विरुद्ध इंग्रजांशी खटपटी करणारे कायस्थ प्रभूच.
(४) सातारकर छत्रपती प्रतापसिंह यांच्या पदभ्रष्टतेला मूळ कारण कायस्थ प्रभूच.
याशिवाय, कायस्थाची बीजकुळे हीन ठरविणारे अनेक घाणेरडे आरोप राजवाड्यांनी केले. भा. इ. सं. मंडळाचे ते वार्षिक अहवाल इतर पुस्तकांप्रमाणे सर्वसामान्य लोकांपर्यंत जात नसत आणि आजही जात नाहीत. पुराव्यासाठी कधी कोणाला लागायचे. हा असला तेजोभंग आणि बदनामी करणारा पुरावा जेव्हाच्या तेव्हा रोखठोक पुराव्यानिशी उलथून पाडला नाही, तर तो भावी पिढ्यांच्या उरावर सारखा नाचता राहणार, या विचाराने मी संतप्त झालो आणि प्रतिष्ठेने केवढे का मत्त मतगंज असत ना, मी त्यांना यथास्थित लंबा करणार, या निर्धाराने मी महाराष्ट्रभर प्रचाराचा दौरा काढून, जातभाईंना जाग आणली. गोवर्धन ब्राह्मण, शुक्ल यजुर्वेदी (पळसे), दैवज्ञ आणि मराठा समाज यांच्यावरही असेच हल्ले चढविण्यात आले होते. त्यांचे प्रतिनिधी प्रतिकारासाठी माझ्या गाठीभेटी घेऊ लागले.
या प्रकरणाची पार्श्वभूमी
ब्राह्मणब्राह्मणेतर वाद ब्रिटिशांच्या राजवटीतच निर्माण झाला असे नाही, तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अमदानीपासूनच चाललेला होता. हा वाद भडकविण्यासाठी धार्मिक व सामाजिक हक्कांचे सरपण जरी वेळोवेळी जळणासाठी वापरण्यात येत असे, तरी त्यातला खरा निखारा राजकारणीच असे. शिवाजीच्या उदयापासून कायस्थ प्रभू राजकारणात अग्रेसर होते. छत्रपतींची सारी सत्ता पेशव्यांच्या हाती गेल्यावर, प्रभूंचा राजकारणातील अग्रमान खच्ची करून, त्यांना सामाजिक दृष्ट्याही हिणकस ठरवून सांधी कोपऱ्यात कायमचे कोंबण्याचे पेशव्यांचे नि त्यांच्या जातभाईंचे यत्न जोरावर शेफारले. एखाद्या जातीला सर्वतोपरी नामोहरम करण्याचे दोन मार्ग असतात. एक शरीरवध आणि दुसरा नीचतर जातीत समावेश. पैकी पहिला अशक्य म्हणून दुसऱ्याचा अवलंब पेशव्यांच्या अमदानीत ब्राह्मणांनी केला. वेदोक्त पुराणोक्त या बाबी चालू जमान्यात कचऱ्याच्या मोलाच्याही उरल्या नसल्या, तरी त्याकाळी कोणत्याही जमातीचे सामाजिक उच्चनीचत्व ठरविण्याचे ते महत्त्वाचे गमक मानले जात असे. कायस्थ प्रभूंवर पेशवाईतच ग्रामण्यांचा भडिमार जबरदस्त झाला. विद्येने, संस्कृतीने, मुत्सदगिरीने आणि पराक्रमाने पेशवाई-अभिमानी ब्राह्मणांशी समबल, किंबहुना कांकणभर सरस अशा प्रभू जमातीला क्षुद्रत्वाच्या, नव्हे शूद्रत्वाच्या खाईत ढकलण्याला निर्ढावलेल्या ब्राह्मणांनी मराठ्यादी ब्राह्मणेतर जमातींवर कसकसले आरोप करून, सामाजिक प्रतिष्ठेच्या कोणत्या नीचतर पातळीवर नेऊन डांबण्याचे यत्न केले असतील, याची आजच्या `जातपात-सब-झूट`वादी मंडळींना कल्पनाही करता येणार नाही.
या सगळ्या वादाचा कडेलोट, खरं पाहिलं तर शेवटच्या छत्रपती प्रतापसिंहाच्या काळात झाला. त्यावेळी कायस्थ प्रभूंची राजकीय क्षेत्रातून हकालपट्टी करण्याचे चिंतामणराव सांगलीकरांनी जे कारस्थान रचले त्याचीच री ब्रिटिश अमदानीत राजवाडे कंपूने हिरिरीने पुढे रेटण्याचा हिय्या केला. `कंपू` शब्द मी मुद्दाम योजीत आहे. कारण, त्या सुमारास भारतेतिहास संशोधक मंडळाच्या तथाकथित काही संशोधकांनी प्रभूंच्या सामाजिक धार्मिक हिणकसपणाचे आणखीही काही (खरे खोटे) कागद पैदा करून, ते वृत्तपत्रांतून छापण्याचा तडाका चालविला होता. अर्थात तो सारा उद्योग कोणत्या ठाम हेतूने करण्यात येत होता, हे न उमगण्याइतके कोणीही अजागळ नव्हते. वरचेवर, संधी सापडेल तेव्हा, एका काळच्या सत्तामदाने शिरजोर झालेले ब्राह्मण पंडित, इतिहास संशोधनाच्या किंवा आणखी कसल्या तरी फिसाटाच्या पांघरूणाखाली, कायस्थादी ब्राह्मणेतरांवर आणि अनेक चित्पावनेतर ब्राह्मणांवरही हल्ले चढवायला सवकलेले आहेत, त्यांचा एकदा कायमचा पुरा बंदोबस्त केलाच पाहिजे या हिरिरीने मी.....
कोदण्डाचा टणत्कार
हे पुस्तक लिहून प्रसिद्ध केले (१७-११-१९१८). समोरच्या प्रतिस्पर्ध्याच्या विद्वत्तेचा नि तपश्चर्येचा योग्य तो आदर राखून, रोखठोक अस्सल ऐतिहासिक पुराव्यांनी त्याची विधाने सफाचाट कशी खोडता येतात, ते आजही त्या (दुर्मिळ) पुस्तकाच्या वाचनाने कोणालाही पटवून घेता येईल. टणत्काराच्या सहा हजार प्रती अवघ्या पंधरवड्यात महाराष्ट्रभर खपल्या. ब्रिटिश सरकारलाही भारत इतिहास संशोधन मंडळाच्या खट्याळपणाची खात्री पटली आणि मंडळाला चालू असलेली वार्षिक दोन हजार रुपयांची ग्रांट बंद करण्यात आली. या पुस्तकाने तमाम ब्राह्मणेतर जमातींची झोप उडाली. जदुनाथ सरकार, ग्वालेरचे श्री. लेले, रा. ब. सरदेसाई, रा. ब जोशी, प्रभृती अनेक इतिहास-पंडितांनी आणि पत्रकारांनी टणत्काराला पाठिंबा दिला.
मी याच्याही पुढे गेलो. राजवाड्यांनी सातारा गळाठ्यातील ज्या वावडीइतक्या लांबलचक दस्तावरून, कायस्थ प्रभूंवर आरोप केले होते. तो दस्तच मी मिळवला आणि श्री. वा. सी. बेन्द्रे यांच्यामार्फत भा. इ. सं. मंडळापुढे मांडला. राजवाडे तेथे हजर होते. सर्वांनी काटेकोर चिकित्सा करून, तो दस्त चिंतामणराव सांगलीकरांनी कायस्थ प्रभू, मराठे आणि इतर जमाती यांच्याविरुद्ध बनावट दस्त बनविण्याचा जो कारखाना प्रतापसिंहाच्या वेळी चालू केला होता, त्यातलाच एक बनावट कागद आहे, हे मान्य करून घेतले.
खुद्द राजवाडे यांची प्रतिक्रिया
मी काय असावी, याचा शोध घेण्याचे, अनेकांनी अनेक यत्न केले. पण व्यर्थ. मी लावीन तो शोध नि देईन तो बोध महाराष्ट्राने शिरसावंद्य मानावा, नव्हे, मानलाच पाहिजे, एवढा ज्यांचा वास्तव अधिकार नि प्रतिष्ठेचा दरारा, त्याच राजवाड्यांवर त्यांचा तसला शोध नि बोध आरपार खोटा ठरविण्याचे अपूर्व धाडस करणारा मी. तेव्हा राजवाडे अगदी चवताळलेले असतील. असा अनेकांचा समज. पण त्याच सुमाराला पुण्याला पहिले साहित्य संमेलन झाले. त्याच्या अध्यक्षीय भाषणाच्या पुस्तिकेत, राजवाड्यांना मान्य असलेल्या ७०-७५ मऱ्हाठी लेखकांची जी यादी दिली आहे, त्यात त्यांनी माझ्या मऱ्हाठी कलमबहाद्दरीचा उल्लेख केलेला आहे. इतकेच नव्हे, तर पुढे ९ जुलै १९१९ रोजी प्रसिद्ध झालेल्या `ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास` या माझ्या अडीचशे पानी इतिहासविषयक ग्रंथावर धुळ्याच्या `इतिहास आणि ऐतिहासिक` मासिकात राजवाड्यांनी माझ्या महाराष्ट्राभिमानाचा प्रांजळ गौरव आणि राष्ट्रैक्याबद्दलची माझी तळमळ, यांचा स्पष्ट उल्लेख करून अनुकूल अभिप्राय दिलेला आहे.
याला म्हणतात स्नेहधर्म
हे राजवाडे प्रकरण महाराष्ट्रात जबरदस्त गाजले. त्यावेळी माझे स्नेही महाशय दत्तोपंत पोतदार हे भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस होते. वादावादीचे वरचेवर फुटणारे सुरूंग ते ऐकत होते, पहात होते. अनेक वेळा त्यांच्या माझ्या गांठीभेटी होत असत. या प्रकरणावर आम्ही बोलतही असू.
"वादांचं काय घेऊन बसलात? संशोधनात वाद होणारच नि ते झालेच पाहिजेत. राजवाडे काय किंवा कोणी आणखी काय, मुद्दे चुकलेले असतील, तर हल्ला होणारच. त्यात काय एवढे?" एवढे म्हणून ते मोकळे होत. त्या काळापासून आजदिनतागायत आम्हा दोघांच्या स्नेहधर्मात किंवा आपुलकीत लवमात्र द्वैताचा अंश शिरलेला नाही. याला म्हणतात स्नेहधर्म. नाहीतर आजकाल किंचितही नुसता मतभेद होताच परस्परांत विस्तव जात नाही.
वसंत व्याख्यानमालेतील माझे व्याख्यान
राजवाडे प्रकरण उकळत असतानाच श्री. दत्तोपंत पोतदारांनी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत माझे व्याख्यान ठरविले. अध्यक्ष होते नरसोपंत केळकर. स्वराज्याच्या उपक्रमात महाराष्ट्रातल्या साधुसंतांचा काहीही भाग नव्हता, या विषयावर तास दीडतास माझे भाषण झाले. समारोप करताना नरसोपंत म्हणाले - "आजचे भाषण पुष्कळांना चमत्कारिक वाटण्याचा संभव आहे. पण ते वास्तविक चमत्कारिक नसून चमत्कारपूर्ण आहे. कारण काही ऐतिहासिक मुद्यांवर ठाकरे आणि राजवाडे यांची तोंडे दक्षिणोत्तर असली, तरी या एका मुद्याबद्दल ते दोघे अगदी एकजिनसी एकमुखी आहेत." या व्याख्यानाचा अहवाल माझे स्नेही अनंतराव गद्रे यांनी संदेशकडे पाठवला. त्यावर अच्युतरावांनी `ठाकरे यांचा शंखध्वनी` असा ठळक मथळा घालून छापला. काही दिवसांनी मी अच्युतरावांना भेटलो. तेव्हा ते म्हणाले - "हे बघा केशवराव, असा काहीतरी भडक मथळा घातला म्हणजे लोक तो मजकूर वाचतात आणि संदेशही खपतो. तुमचे काम नि आमचे काम."
वाचकहो
"अहो, तो काळ गेला. आता कशाला त्या जखमांवरील खरपुड्या काढता?" असा साळसूद उपदेश कित्येक करतील. पण जीवनगाथा म्हणजे ज्या ज्या काळातून माझा जीवनप्रवाह वहात गेला, त्या काळाच्या इतिहासाचे सत्यकथन करणे मला प्राप्त आहे. यामुळे अर्धशतकानंतर आजचा मऱ्हाठदेशी समाज कसकसल्या सामाजिक क्रांतीच्या घालमेलीतून क्रमशः बाहेर पडला आहे, याचे ज्ञान होईल. यापेक्षा अन्य हेतू काहीच नाही.
दादर इंग्लिश स्कूलची समाजसेवा
सन १९०५ साली मी प्रथम दादरला आलो. तेव्हापासून सन १९१८ पर्यंत दादरचे मूळचे खेड्याचे रूप झपाट्याने बदलत चालले होते. कै. अक्षीकर आणि कै. केशवराव भगवंत ताम्हाणे यांनी भविष्याचे सूक्ष्म निदान ठरवून, खेडेवजा दादर भागात दादर इंग्लिश स्कूलची प्राणप्रतिष्ठा केली. कल्याण येथेही एक शाखा चालविली. आज त्याच शिक्षणसंस्थेला छबिलदास हायस्कूलचे भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.
लेडी जमशेटजी रोडवर असलेल्या दादर इंग्लिश स्कूलच्या इमारतीत असलेला एकच हॉल (तेथे वर्ग भरत असत) होता. तोच त्याकाळी आमचा दादरचा टौन हॉल प्रिं. कोल्हटकर मास्तरांना भेटले, का हव्या त्या कार्यक्रमासाठी हॉल मिळायचा. त्यावेळी टीचटीचभर रिकामी जागा रोखठोक भाडे घेऊन वापरायला देण्याची दामोदरी रूढी लोकांना ठावी नव्हती. त्यामुळे त्या हॉलमध्ये वरचेवर सामाजिक, धार्मिक आणि राजकीयसुद्धा, अनेक कार्यक्रम होत असत. दादरच्या गणेश शास्त्रीय संगीत शाळेच्या विद्यमाने, अल्पवयी मास्टर मनहर बर्वे यांचा पहिला सार्वजनिक परिचय दादरच्या लोकांना झाला तो याच हॉलमध्ये. त्यावेळी मनहरजींचे वडील गोपाळराव बर्वे यांचे व्याख्यान आणि मनहरजींच्या बालआवाजीतल्या गायनाचे व विविधवाद्य वादनाचे सुश्राव्य कार्यक्रम झाले. सहकारी सोसायट्यांच्या वार्षिक सभा येथेच साजऱ्या व्हायच्या आणि गोविंदराव मंडळाचे वार्षिक उत्सव याच शाळेच्या मागील पटांगणात साजरे व्हायचे. सन १९१८ च्या भयंकर इंफ्लुएंझाच्या साथीत स्टुडंट्स सोशल युनियनने प्रो. टी. कै. गज्जरचे इंफ्लुएंझा मिश्चरचे मोफत औषध देण्याचा दवाखाना चालविला, तो येथेच आणि दुष्काळाची भूक भागविण्यासाठी मुंबईला प्रथम मांडला तांदूळ आला, तो वाटण्याची कामगिरीही स्टुडंट्स सोशल युनियनने केली, तीही याच शाळेच्या तळमजल्यावरच्या एका वर्गाच्या जागेत. गांधीयुगात (सन १९२०) `शाळा-कॉलेजे छोड़ दो`ची जाहीर सभा येथेच भरली आणि अनेक हिंदु, पारशी, युरोपियन समाज-सुधारक वक्त्यांची भाषणेही याच ठिकाणी दणाणली.
प्रिं. कोल्हटकर मास्तरांच्या पाठिंब्याने स्टुडंट्स सोशल युनियन समाजविचारक्रांतीच्या अनेक चळवळी या ठिकाणी करीत असे. ही सर्व तरुण मंडळी याच शाळेतून मॅट्रिक परीक्षा पास होऊन कॉलेजात शिक्षण घेणारी, किंवा ते घेत असताना त्याच शाळेत पार्टटाईम शिक्षकीय नोकरी करणारी असत. सर्वांचे माझ्याकडे सल्लामसलतीसाठी जाणेयेणे अखंड चालू असे. युनियनने माझी अनेक व्याख्याने या ठिकाणी घडवून आणली. पैकी दि. २३ जून १९१८ रोजी `कुमारिकांचे शाप` या हुंडानिषेधक विषयावर जाहीर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कोल्हटकर मास्तरच होते. त्या व्याख्यानाचा अहवाल अनेक तरुणांनी टिपून घेतला होता. त्यावरून मी एक पुस्तक लिहावे असा आग्रह कोल्हटकर मास्तरांनी केला. इतकेच नव्हे तर हुंडानिषेधाच्या कोणत्याही चळवळीला आपण तनमनधनाची लागेल ती मदत करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
तो प्रसंगच तसा होता. त्यावेळी बंगालच्या कुमारी स्नेहलतेने, बापाला हुंडा देण्याची ऐपत नसल्यामुळे, हुंडा रूढीचा धि:कार करण्यासाठी स्वतःला जाळून घेतले होते. ते आंदोलन महाराष्ट्रात विलक्षण हिरिरीने चालले होते. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात तर काय, स्नेहलतेच्या स्मरणार्थ तिची लॉकेटे विद्यार्थ्यांनी एकमेकांत वाटून, हुंडा न घेण्याच्या शपथविधीचा मोठा जाहीर सोहळा केल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. मुंबईचाही विद्यार्थीवर्ग स्नेहलतेच्या आत्मबलिदानाने संतापलेला होता. अशा प्रसंगी माझ्या व्याख्यानाला तुडुंब गर्दी जमली, यात नवल काहीच नाही. ठिकठिकाणांहून होणाऱ्या तोंडी लेखी आग्रहाचा मान राखण्यासाठी, युनियनच्या स्नेही मंडळींनी पुरविलेल्या भाषणाच्या नकलांवरून `कुमारिकेचे शाप` हे छोटे पुस्तक दि. २८-२-१९१९, महाशिवरात्र शके १८४० रोजी, प्रकाशक यशवंतराव राजे, यांनी प्रसिद्ध केले. मी ते श्रीमंत नामदार सर गंगाधर माधवराव चिटणवीस, के. सी. आय. ई.; नागपूर यांना अर्पण केले होते. या पुस्तकाच्या ३५०० प्रती हा हा म्हणता विकल्या गेल्या आणि त्याने माझ्या सन १९२१ सालच्या हुंडा-विध्वंसक आंदोलनाचा पाया चांगलाच घातला.
महाराष्ट्रभर दौरे
राजवाडे प्रकरणाची जागृती करण्यासाठी मी नागपूर, अकोला, यवतमाळ, अमरावती, पुणे, बेळगाव, कोल्हापूर, सातारा वगैरे ठिकाणी दौरा काढला. ठिकठिकाणच्या जाहीर व्याख्यानांनी माझा शेकडो ब्राह्मणेतर बांधवांशी ऋणानुबंध जुळला गेला. आसपासच्या कित्येक गावांतही मला त्यांनी नेऊन, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक पुनरुत्थानावर माझी व्याख्याने करविली. याच दौऱ्यात मला बहुजन समाजाच्या हलाकीचा आणि भिक्षुकशाही पिळवणुकीचा साक्षात्कार झाला. शहरातील रूढीचा धिंगाणा संभावितपणाच्या सफेदीखाली फारसा दिसत नसला, तरी तालुक्यांच्या नि खेड्यांच्या ठिकाणी रूढीचे बंड जबरदस्त चालू असे. पांढरपेशा शहाण्यासुरत्या समाजात हुंड्याची `भाड` खाण्याचा प्रघात बोकाळलेला, तर मागास वर्गात `देज`ची रूढी भयंकर मातलेली. `देज` म्हणजे मुलींचा हुंडा उकळण्याची पद्धत. यामुळे गरिबाला बायको मिळविण्यासाठी कर्जाचा डोंगर उरावर घ्यावा लागत असे, आणि मुलींच्या बापांना आपल्या मुली म्हणजे दर्शनी हुंड्याच वाटत असत. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे, गावचे कुळकर्णी, मारवाडी, सावकार, वकील, व्यापारी शेतकऱ्यांना पिळून मळून काढण्यात बेदरकार बनलेले. त्यांच्याविरूद्ध ब्र काढण्याची कोणाची हिंमत चालत नसे. कोठेही जा, जो भेटेल तो कोर्टाच्या तारखांच्या तारांच्या भेंडोळ्यात गुरफटलेला. गायकीची भांडणे, जमीनदाव्याची भांडणे, कुळकटीच्या कटकटी ठिकठिकाणी सारख्या चाललेल्या अस्पृश्यांच्या हालांची तर परमावधी. शिवाय, त्यांच्या त्यांच्यात श्रेष्ठ कनिष्ठतेचे झगडे. मुंबईसारख्या शहरात राहणाऱ्यांना बाहेरगावच्या लोकांची ही अनावस्था स्वप्नांतही येणे अशक्य होते. कोणी त्याबद्दल काही कठोर उद्गार काढले किंवा काही लिहिले तर शहरी शहाणे त्यालाच वेड्यात किंवा ब्राह्मणद्वेष्ट्यात काढून मोकळे व्हायचे.
ब्राह्मणेतर चळवळीकडे आकर्षिला गेलो.
सामाजिक सुधारणेची शहरी लोकांना वास्तविक काही आवश्यकता नाही. बदलत्या परिस्थितीच्या रेट्याने ते आपोआप बदलत जातात. खरी जरूर आहे ती मागासलेल्या बहुजन समाजाच्या सर्वांगीण जागृतीची. त्यासाठी पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगावादी ठिकाणी काही जागृत मंडळींनी चालविलेल्या उपक्रमांकडे माझे लक्ष साहजिकच वळले. वळले म्हणण्यापेक्षा त्या मंडळींनीच मला आपल्याकडे आकर्षित केले. कायस्थ प्रभू जमात किती झाली तरी पिढ्यान् पिढ्यांची राजकारणी कर्तबगार आणि विशेष म्हणजे बोलकी (आर्टिक्युलेट). सरकार दरबारी वजन नि अधिकारी असलेली. त्यांच्यावरही जेव्हा कंपूवाले शहरी ब्राह्मण मन मानेल ते जाहीर आक्षेप घेऊन बदनाम करण्याचा हिय्या करतात, तर नाक्षर आणि मुक्या बहुजन समाजांवर काय कहर उसळत असेल, याची सहज कल्पना करता येण्यासारखी होती. बहुजन समाजाचा प्रश्न राहू द्या, परंतु दैवज्ञ ब्राह्मण, सारस्वत, शुक्ल यजुर्वेदी (पळशे) आणि मराठा समाज यांच्यावरही, या ना त्या निमित्तावर तसलेच हल्ले होऊ लागले होते. आक्षेपकांना जाहीर उत्तर द्यायचे, तर कोणाच्याही हाती वर्तमानपत्रे नव्हती. याच सुमाराला कोल्हापूरचे वेदोक्त प्रकरण भडकले.
छत्रपती शाहू महाराजांनी राजोपाध्यांना कामावरून दूर केले. मग हो काय विचारता? ब्राह्मणी वृत्तपत्रांतून महाराजांवर जहरी टीकेचा आग्याडोंब उसळला. कोल्हापूर आणि पुणे यांचे हाडवैर पेशवाईपासून अव्याहत चालत आलेले. शाहू महाराजांनी भिक्षुकशाही वर्चस्वाचे आमूलाग्र निर्दाळण करण्याचा संकल्प सोडताच, पुण्याची सारी वृत्तपत्रे त्यांच्यावर तुटून पडली नसती तरच ते एक नवलाईतले नवल झाले असते. बहुजन समाजाला जाग आणण्याचे महाराजांनी व्रतकंकण बांधले. प्रश्न साधासुधा नव्हता. जगड्व्याळ होता. ते कार्य छत्रपतींसारख्या कर्तुमकर्तुमन्यथा कर्तुम् सत्ताधाऱ्यानेच हाती घेतल्यामुळे, महाराष्ट्रातल्या तमाम मागास बहुजन समाजात जागरूकतेची एक नवीन लाट उसळली. आत्मोद्धारासाठी त्यांची नजर कोल्हापूरवर खिळली. पुण्याच्या पत्रांतून महाराजांच्या वैयक्तिक निंदा नालस्तीचे सुरूंग कडाकड फुटू लागले, तसतसा बहुजन समाजाचा संतापही उकळू लागला.
मलबारी शेटचा इशारा
सुप्रसिद्ध समाज-सुधारक मलबारी यांनी एक सूत्र सांगितले आहे. त्यांच्या ग्रंथाचे परिशीलन करताना, हे एकच सूत्र मी आपल्या स्मरणात ठेवले होते. ते असे - "आज प्रत्येक हिंदु सुधारकाची अशी खात्री पटलेली आहे की एखादी सुधारणा प्रत्यक्ष घडवून आणण्याच्या कामी स्वतः झगडणे म्हणजे स्वतःच्या गळ्यावर सुरी फिरवून आपल्या निरपराध कुटुंबाचा सर्वनाशच करून घेण्यासारखे आहे."
ब्राह्मणेतर बहुजन समाजाची पहिली गरज एकच. भिक्षुकशाहीच्या सापळ्यातून मुक्तता. हे काम लहानसहान नव्हते. लोकप्रियतेचा मोह दहा योजने दूर लाथाडून केल्याशिवाय ते साधणारे नव्हते. लोकांचे काय? आज ज्याला ते डोक्यावर घेऊन नाचतील त्यालाच ते उद्या लाथाडतील. ज्याचा एकदा ते मनस्वी छळ करतील, त्याचाच आणखी दोनतीन पिढ्यांनी महात्मा म्हणून उदो उदो करतील. म्हणून ज्याला काही समाजकार्य करायचे असेल, त्याने प्रथम लोकमताच्या बागुलबुवाचा मनोमन पक्का बंदोबस्त करावा लागतो.
छत्रपती शाहू महाराजांचे निमंत्रण
वरचेवर ग्रामण्ये कां होतात? या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्यांच्या साद्यंत इतिहास संशोधनाचे काम मी हाती घेतले. गावोगाव अनेकांना पत्रे लिहिली, अनेकांना भेटलो, जुने कागदपत्र मिळविले, त्यांचा अभ्यास चालू केला. याच सुमाराला `मराठे क्षत्रिय का शूद्र?` हा वाद तंजावर कोर्टात चालू होता आणि शाहू छत्रपती त्या खटल्यात जिव्हाळ्याने भाग घेत होते. माझ्या इतिहास संशोधनाची आणि शहरोशहरीच्या पायपिटीची बातमी महाराजांच्या कानांवर गेली नसती, तरच ते नवल झाले असते. त्यांना इतिहास-विषयक बाबतीत सडेतोड सिद्धान्त सांगणारा कोणीतरी हवाच होता. महाराजांच्या संग्रही भास्करराव जाधव, प्रो. डोंगरे आणि अण्णासाहेब लठ्ठे ही विद्वान संशोधकांची त्रयी होतीच. त्यांतल्याच कोणीतरी माझे नाव महाराजांना सुचविले असावे.
छत्रपती शाहू महाराजांची भेट
सन १९१८. एक दिवस कै. बाळासाहेब वैद्यांचा माझ्या हापिसात मला फोन आला की त्याच दिवशी पूना एक्सप्रेसने मला कोल्हापुरास गेले पाहिजे. शाहू महाराजांनी बोलावले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळीच आमची स्वारी कोल्हापूर स्टेशनात येऊन दाखल झाली. महाराजांना भेटायला जायचे, म्हणजे कुठे नि कसे? थोडासा बुचकळ्यात पडलो. स्टेशनवर ५-६ माणसे अनेक पासिंजरांचे चेहरे निरखीत इकडे तिकडे गडबडीने फिरत होती. अधूनमधून कोणालातरी नावगावही विचारीत होती. म्हटले, सीआयडीचे लोक असावे नि कोणाचा तरी शोध घेत असावे. आपल्याला काय करायचे? इतक्यात त्यांतलाच एक सरळ माझ्याजवळ आला नि माझे नाव विचारले. मी सांगितले. लगेच त्याने शिटी फुंकली आणि मला म्हणाला - "चला महाराजांकडे जायचे आहे ना तुम्हाला? गाडी घेऊन आलो आम्ही. चला." घोड्यांच्या गाडीत आमची बैठक थाटली आणि सुमारे १०-१५ मिनिटांतच मी राजवाड्याच्या कंपाउंडातील दिवाणसाहेब सर सबनीस यांच्या बंगल्यात आलो. स्वतः दिवाणसाहेब सामोरे आले आणि माझे हसतमुखाने स्वागत केले. शौच मुखमार्दनादी विधी उरकल्यावर, चहापानाच्या वेळी, मला बोलावण्याचे कारण त्यांनी सांगितले.
चहापान आटोपले असेल नसेल, तोच महाराज आल्याची वर्दी मिळाली. महाराज आले ते अंगणातच उभे राहिले. दिवाणसाहेब आणि मी पुढे होऊन प्रणाम केला. काही क्षण महाराज माझ्याकडे आपादमस्तक नुसते पहातच होते. त्यांची ती नजर मोठी सूक्ष्मभेदी होती. मागाहून मी हा मुद्दा दिवाणसाहेबांपाशी काढला तेव्हा, प्रथम ते हसले नि म्हणाले - "म्हणजे तुमच्या तो लक्षात आलाच तर. या नजरेच्या परीक्षेला जो उतरला, तो पास झाला. पण मी मात्र त्याच वेळी तुमच्याकडे पहात होतो. या पहिल्याच नजरेने कोण माणूस कसा असावा, काय करू शकेल, वगैरे इत्थंभूत तपशील महाराज हा हा म्हणता आजमावतात. महाराजांचे फिजिऑनमी नि सायकॉलॉजीचे ज्ञान उपजतच असून, त्यांनी एका क्षणात काढलेले खटके फारसे चुकत नाहीत. तुमच्याशी ते बोलायला लागल्यावर माझा जीव भांड्यात पडला. नाहीतर कित्येकांना नुसते असे पाहिल्यावर चटकन सांगायचे, "बराय, ठीक, जावा आता."
छत्रपती : तुम्ही सरकारी नोकरीत आहात? कायम का लाल फितीवर? (मला लाल फितीचा खुलासा होईना, तेव्हा दिवाणसाहेब म्हणाले, "परमनंट का टेम्परवारी एस्टाब्लिशमेंटवर? असे विचारताहेत महाराज.")
"लाल फितीवर. मुंबई इलाख्यातील बहुतेक सारी पी. डब्ल्यू. डी. ची हापिसे लाल फीत नेमणुकीचीच आहेत." असे मी सांगितले.
थोड्याच वेळात श्रीमंत बाळा महाराज, जाधवराव आणि इतर काही अधिकारी तेथे आले. महाराजांनी स्वतःच त्यांच्याशी माझा परिचय करून दिला. "प्रथम यांना आपली सारी बोर्डिंगे दाखवा." असा हुकूम दिला आणि "आपण रात्री बोलू" असे मला सांगून महाराज गेले. दुपारचा चहा झाल्यावर, श्री. बाळा महाराज आपली डॉक-कार्ट घेऊन आले आणि आम्ही कोल्हापुरात महाराजांनी निरनिराळ्या जमातींसाठी चालू केलेली बोर्डिंगे पाहिली. महाराजांच्या नोकरीत ब्राह्मणब्राह्मणेतर अधिकारी तर सरमिसळ होतेच, पण कित्येक ब्राह्मण अधिकारी त्यांच्या खास विश्वासातले होते. अस्पृश्य आणि इतर जमातींची (विशेषतः मराठा जमातीची) मुले एकाच बोर्डिंगात रहात असलेली पाहून, महाराजांच्या दलितोद्धाराविषयी शिक्षणप्रसाराच्या निकडीविषयी कोणाचीही खात्री पटेल, मग माझी पटल्यास आश्चर्य नाही. महाराजांविषयी खालसातली वर्तमानपत्रे सदोदित करीत असलेला गवगवा सत्यावर आधारलेला नसून, त्यामागे गवगवा करणारांची काही विशेष कारस्थानी योजना असावी, असा माझा साधार ग्रह झाला.
अस्पृश्योद्धार नि शिक्षणप्रसार
या दोन प्रयत्नांनी झाला तर मागास जमातींचा उद्धार होईल. या वाक्याने महाराजांनी रात्रीच्या बैठकीचा प्रस्ताव केला. महाराज पुढे म्हणाले - "राजकारण आणि अस्पृश्यता यांचा काय संबंध आहे, असे काही लोक विचारतात. अस्पृश्य वर्गांना निदान माणसांप्रमाणे आम्ही जर वागविले नाही, तर आमचे राजकारण बरोबर रीतीने कसे चालेल? ज्यांना राजकारणात भाग घ्यायचा असेल, त्यांनी इतर देशांप्रमाणे याही देशात प्रत्येक मनुष्याला मनुष्यत्वाचे सर्व अधिकार दिले पाहिजेत. नाहीतर आमच्या हातून मुळीच देशसेवा होणार नाही. आज खेडोपाडी भिक्षुक उपाध्ये, ब्राह्मण नि मारवाडी सावकार, खडुतांना छळतात पिळतात, म्हणून आपण मोठा आरडाओरडा करतो. पण याला कारण त्या लोकांचे अज्ञान. ते घालविण्याचा कोण किती खटाटोप करतो? तो जोरात व्हायला पाहिजे. अहो, सत्यशोधक मताप्रमाणे लग्न लावताच, गावोगावच्या भिक्षुकांनी लोकांवर खटले भरले आहेत. तुम्हा खालसातल्या लोकांना त्याचे काय? वर्तमानपत्रांत बातम्या येतात, तुम्ही त्या वाचता नि गप्प बसता. खटल्याच्या भरताडीवर वकिलांची धण होत असते. धर्माच्या नावावर शेकडो रूढी चालू आहेत. खेडूतच कशाला? शहरातले शहाणेसुरते लोकही त्या रूढींच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत. एक हकिकत सांगतो ऐका. कोल्हापुरात एक वकील आहेत. एरवी पक्के सुधारक. पण त्यांची आई वारली नुकतीच, तेव्हा चंडणमुंडण करून स्वारी आईची हाडकं घेऊन नाशकाला धावली. असे कां हो? मी विचारले, तेव्हा शहाणे म्हणतात, "काय करावं? जातिरिवाज न पाळून कसं चालेल?" बोला. शहरी लोकांचा हा भ्याडपणा, तर बिचाऱ्या खेडुतांची दशा काय असणार? कोट्यवधी मागासलेल्या खेडुतांच्या उद्धाराचा आज सवाल आहे. त्यांना सामाजिक धार्मिक रूढींच्या विळख्यातून सोडवायचे आहे. त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या सत्यशोधक तत्त्वांचा खूप प्रसार व्हायला पाहिजे. नुसते शहरी शिकलेले लोक सुधारले म्हणजे हिंदुस्थान सुधारला, असं कसं म्हणता येईल? या कामासाठी जिव्हाळ्याने काम करणारे शेकडो हजारो समाजसेवक पाहिजेत. हे पहा ठाकरे, आम्ही नि आमच्या संस्थानाने या कामाला हात घातला आहे.
सुमारे एक तासभर महाराज बोलत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ च्या सुमाराला महाराजांची नि माझी दुसरी बैठक झाली. तंजावरचा खटला, प्रो. डोंगरे यांनी साताऱ्याहून आणलेले `सिद्धान्त विजय` विषयक जुने कागदपत्र आणि त्यांचे वाचन, सत्यशोधक तत्त्वांचा प्रस्तार, सत्यशोधक जलसे, इत्यादी अनेक मुद्यांवर संभाषणे, खुलासे प्रतिखुलासे झाले. त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या या भेटीतच श्रीमंत बाळा महाराज, जाधवराव, अण्णासाहेब लठ्ठे, प्रो. डोंगरे यांचा माझा स्नेह ऋणानुबंध जुळला तो त्यांच्या मृत्युक्षणापर्यंत कायम टिकला. या खेपेला, सन १९०७-८ सालच्या माझ्या कोल्हापूर वास्तव्याच्या वेळी परिचय झालेल्या अनेक स्नेहांच्या गाठीभेटी घेता आल्या. काशीकर घराणे, पोतनीस वकील, मुस्लिम संत बादशहा, दासराम बुक डेपोचे मालक रामभाऊ जाधव, उपाध्ये बोळातील काका तारदाळकर, बागल वकिलांचे घराणे, सासने मास्तर, किती नावे सांगणार? कोल्हापूरभर माझे स्नेही सोबती आजही शेकड्यांनी मोजता येतील एवढे आहेत. कोल्हापुरात ज्या ज्या वेळी मी गेलो, त्या त्या वेळी कोल्हापूर माझे नि मी कोल्हापूरचा. याच एका जिव्हाळ्याच्या ऋणानुबंधाने करवीरकर माझ्याशी वागतात नि मी कोल्हापुराकडे पहात असतो.
शाहू महाराजांनी माझे सत्त्व पाहिले
नोकरीवर असतानाची ही घटना आहे. सन १९२१ जानेवारी असावी. श्रमातिरेकाने टायफाईड-निमोनियाच्या आजाराने मी अत्यवस्थ पडलो. आजार चांगला तीन महिन्यांचा ठरला. भरपगारी हक्काची एक महिन्याची रजा संपल्यावर पुढे मेडिकल सर्टिफिकेटावर अर्ध पगारी रजा. पगार आखडला तरी संसाराचे तोंड वासलेलेच असायचे. याच सुमाराला कोल्हटकरांच्या `संदेश`मध्ये महाराजांविरुद्ध काही मजकूर आला. कोल्हटकर मिरजेला गेले असता, महाराजांची भेट स्टेशनवर अचानक झाली. त्यांनी हाक मारली. हास्यविनोदात बोलणे झाले. पाचशे रुपयांच्या नोटा कोल्हटकरांच्या हातात कोंबून संदेशचे तोंड बंद केले. ही बातमी बहुतेक वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली. कोलटकरांना याविषयी कोणी विचारले तर म्हणायचे, "त्यात गवगवा करण्यासारखे काय आहे? राजाने दक्षणा दिली, या भटाने घेतली. चुकलं कुठं?"
"पैशाच्या जोरावर अनेक माणसांची मी गाढवे बनविली आहेत", नेहमी महाराज म्हणायचे. ते माझ्या लक्षात होते. एखाद्याचे सत्त्व पहायचे म्हणजे तो पैशाच्या कडकडीत अडचणीत असेल अशा नेमक्या वेळी. माझ्या आजाराची बातमी महाराजांपर्यंत साहजिकच गेलेली होती. एके सकाळी अचानक कै. श्रीपतराव शिंदे (`विजयी मराठा`चे संपादक, हे माझे निकटचे स्नेहीच होते.), श्री. मथुरे आणि दरबारचे एक अॅडव्होकेट (त्यांचे नाव विसरलो. तंजावर केसच्या खटपटीत दरबारातर्फे ते काम पहात असत.) ही मंडळी मिरांडा चाळीत माझ्या बिऱ्हाडी आली. मी बिछान्यावर पडलेलो होतो. ती मंडळी भोवती कोंडाळे करून बसली. इकडे तिकडे बातचीत झाल्यावर, पुराणांच्या आधाराने अमुक विषयावर ३०-३२ पानांचे एक चोपडे लिहून द्यावे अशा आशयाचे महाराजांच्या स्वदस्तुरचे पत्र त्यांनी मला दिले.
मी : माझी अवस्था पहातच आहात. लेखन शक्य नसले तरी सांगता या विषयावर मी काहीही लिहिण्याचा स्पष्ट नकार देतो. पुराणे म्हणजे शिमगा मानणारा मी आहे.
अॅडव्होकेट : आत्ताच पाहिजे असे नाही. बरे झाल्यावर निवांतीने लिहिले तरी चालेल.
मी : बरा झाल्यावरही लिहिणार नाही. छत्रपतीसारखा नृपती असे भलभलते विषय काय सुचवतो? एखाद्या जमातीला नीचांतली नीच ठरविली म्हणजे आपली जमात श्रेष्ठ ठरत नाही.
त्यावर त्यांनी खिशातून चेक काढला. "महाराजांनी हा दिलाय, घ्या."
मी : कशाला? कशासाठी? सांगता ते लिहिणे करण्यासाठी? जा परत घेऊन तो.
श्रीपतराव : हे पहा, केशवराव, छत्रपतींचा प्रसाद आहे का. नकार देणे बरे नव्हे.
मी : असला प्रसाद छत्रपतीनेच काय, प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने दिला तरी थुंकतो मी त्यावर. जा घेऊन. (चेक पाच हजारांचा होता.) असल्या रकमा महाराज अशा कामीच उधळत असले, तर त्यांच्याविषयी माझा आदरही ओहोटीला लागला, असे सांगा जाऊन त्यांना. (मंडळी परत गेली.)
गळ टाकण्याची महाराजांची पद्धत
एखाद्याला कसाला लावायचा कसा, याचे तंत्रमंत्र महाराज पुरेपूर जाणत असत. मला आलेले पत्रच तयार झाले कसे पहा ना. कोऱ्या कागदावर एखाद्याकडून नुसता मजकूरच लिहून घ्यायचा. नंतर दुसऱ्याकडून (मजकुराचा भाग त्याला न दिसेल असा उलटा झाकून) माथ्यावरच्या कोऱ्या जागेवर नाव पत्ता लिहून घ्यायचा. पाकिटावर तिसऱ्याकडून नाव पत्ता. नंतर स्वतः सही करून पाकिट सीलबंद करायचे. नंतर हाताखालच्या कोणाला तरी पुण्याला पाठवून हे पत्र घेऊन ठाकऱ्यांना जाऊन समक्ष भेटा, असे कळवायचे. तिघेजण आले, पण एकालाही भेटीचे कारण ठावे नव्हते ते मला नि त्यांना पत्र वाचल्यावर एकदमच समजले. फक्त चेक देण्याचे काम अॅडव्होकेट महाशयांच्या हाती होते.
तसे म्हटले तर अच्युतरावांप्रमाणे महाराजांविरुद्ध मी काहीच लिहिले बोललेले नव्हते. मग हा मृदंगलेप कशासाठी? जे लिहिले होते, त्याचा वेळोवेळी समक्ष खुलाशांनी फडशाही पडलेला होता.
कसल्यातरी सबबीवर मृदंगलेप करून माणसाला बांधून आपल्या कच्छपी लावायचे, उपकाराखाली त्याला जन्मभर वाकता नमता ठेवायचा, या राजकारणी हिकमतीत शाहू महाराजांचा हात धरणारा विरळा!
"आज माझा बोल खरा केलात, केशवराव"
मी आजारांतून उठलो नि हापिसात जाऊ लागलो. एक दिवस हापिसात फोन आला की महाराज मुंबईला आले आहेत आणि त्यांनी पन्हाळा लॉजवर मला भेटायला बोलावले आहे. गेलो. माडीवरल्या खोलीत दिवाणसाहेब सबनीस एकटेच लिहीत बसले होते. मला पहाताच ताडकन ते उठले आणि "या या, केशवराव" म्हणत त्यांनी मला चक्क मिठी मारली. मला काहीच समजेना. दिवाणसाहेब सद्गदित होत म्हणाले, "केशवराव, शाब्बास. अब्रू वाचविलीत तुम्ही माझी."
नंतर त्यांनी मला पत्र येण्यापूर्वीच्या घटना सांगितल्या. "अनेकांना दाने देऊन वाकविले असले तरी ठाकरे कदापि वाकणार नाही, असे मी महाराजांना स्पष्ट बजावले. पण ते म्हणाले, अहो, आज तो आजाराने झालाय जर्जर, पैशाची तंगी, कशाला तो अचानक द्रव्यलाभ नाकारील? मी माझ्या शब्दांना चिकटून बसलो. ते शब्द खोटे पाडण्यासाठी तुमच्याकडे ती मंडळी गेली होती. ती परत आल्यावर आणि तुम्ही काय बोललात वगैरे सर्व सांगितल्यावर मात्र महाराज इंग्रेजीत उद्गारले - He is the only man we have come across who cannot be bought or bribed. त्या क्षणाला मला इतका आनंद झाला की केव्हा भेटतो तुम्हाला नि कडकडून मिठी मारतो. समजा, तुम्ही चेक घेतला असतात, तर तुम्ही नि मी दोघेही... काय ठरलो असतो, विचार करा. पण चला. ऑल्स वेल दॅट एण्ड वेल. तुमच्या विषयीचा माझा आत्मविश्वास सार्थ केलात."
काय रे वांड आमच्या चेकावर थुंकतोस?
आमचे संभाषण होत असतानाच महाराजांची स्वारी आत आली. मला पहाताच म्हणाले, `काय रे वांड, लयि गुर्मी आली व्हय? आमच्या चेकावर म्हणे थुंकतोस?"
मी : महाराज, गुर्मी कशाची? रागावू नका. आजवर मी आपली किंवा दरबारची काय अशी मोठी सेवा चाकरी केली की त्यासाठी आपण अयाचित पाच हजारांचा चेक मला द्यावा? तशीच ठळक कामगिरी होईल माझ्या हातून तेव्हाचा प्रश्न न्यारा. माफ करा सरकार, पैशाच्या जोरावर गाढव बनणारा माणूस मी नव्हे.
या शेवटच्या शेऱ्याने महाराज चांगलेच चमकले, पण मुक्त हास्याच्या खोकाटात तो विषयच त्यांनी बाजूला सारला. कारण पैशाच्या जोरावर माणसांची गाढवं बनवतो मी, हे उद्गार अनेक वेळा त्यांनी माझ्या समक्ष काढलेले होते. नंतर, सध्या मी कोणते पुस्तक लिहीत आहे. याची त्यांनी चौकशी केली. `भिक्षुकशाहीचे बण्ड` लिहीत आहे, असे सांगताच, संदर्भ ग्रंथांची नावे विचारली. मी सांगितली.
महाराज : सॅव्हेलचा प्रीस्ट्क्राफ्ट अॅण्ड किंगक्राफ्ट हा ग्रंथ नाही तुझ्याजवळ? वा वा, तो तर प्रथम अभ्यासला पाहिजे. भिक्षुकशाहीप्रमाणे राजेशाहीसुद्धा ह्युमॅनिटीला जाचक ठरलेली आहे.
मी : मग आपणही त्या कक्षेत सापडता?
महाराज : सापडणारच. सध्याच्या राजेशाह्या काय अमरपट्टा घेऊन आल्या आहेत वाटतं? आजच आम्ही ब्रिटिशांच्या कृपेच्या धाग्यावर लोंबकळलेले आहोत. आज ना उद्या हा धागा तुटणारच. बरं ते असो. हे पहा, अमेरिकेतील आर. पी. ए. सीरीजची पुस्तके चांगली अभ्यास कर. इंगरसॉल्स रायटिंग्ज अॅण्ड स्पीचेस तर नेहमीच अभ्यासात असली पाहिजेत. इंगरसॉल वाचल्याशिवाय समाजसुधारणेची भाषा कोणी बोलू नये.
अशा कितीतरी संदर्भ ग्रंथांची नावे महाराज भडाभड सुचवीत होते आणि कशात काय विषय आहे, यावर जिव्हाळ्याने प्रवचन करीत होते. या क्षणाला प्रथमच महाराजांच्या व्यापक ज्ञानसंग्रहाचा मला साक्षात्कार झाला. फार काय, पण कित्येक पुस्तकांतले काही महत्त्वाचे इंग्लिश परिच्छेद त्यांनी मला पाठ म्हणून दाखविले. वरवर पहाणारांना महाराज अडाणी नि हेंगाडे वाटले, तरी अंतरंगाचा, मुख्यत्वे त्यांच्या परिपक्व ज्ञानाचा मागमूस इतरेजनांना सहसा लागतच नसे. आज तो मला लागला नि मी अगदी चाट पडलो. जवळ जवळ अर्धा तास ते सारखे तन्मयतेने बोलत होते नि मी तितकाच तन्मय होऊन ऐकत होतो.
आमी काय, रांगडे हेंगाडे!
सुशिक्षितपणाचा टेंभा मिरवणारी काही पांढरपेशी मंडळी महाराजांच्या भेटीला गेली, का ते जाणूनबुजून हेंगाड्यासारखे वागत आणि मुद्दाम हेंगाडी भाषा बोलत. समक्ष घडलेली एकच गोष्ट सागतो.
मी कोल्हापूरला गेलो असता, भेटीसाठी मला राजवाड्यात बोलावले होते. अतिथिगृहाच्या प्रशस्त दिवाणखान्यात मेजावर पडलेली वृत्तपत्रे, इंग्रेजी मासिके चाळीत बसलो. चांगला तास गेला. आजूबाजूला असलेल्या मंडळींनी `महाराज स्नानाला गेले आहेत`, असे सांगितले. इतक्यात इचलकरंजीचे अधिपती श्रीमंत बाबासाहेब घोरपडे आपल्या लवाजम्यानिशी तेथे आले. तेही बसले, आणखी अर्धा तास गेला. सगळे अंग पाण्याने निथळत आहे. कमरेभोवती भला मोठा टावेल गुंडाळला आहे. अशा उघड्या बोडक्या अवस्थेत महाराज दिवाणखान्यात आले. आम्ही सर्वांनी मुजरे केले. "बसा बसा. माफ करा हं. टाईम चुकला. आंगोली धुवायची होती आमाला. म्हून याळ लागला. काय बाऽसाहेब, आलात इलायत बघून?" बाबासाहेब पुढे झाले नि त्यांनी विलायतच्या प्रवासवर्णनाचा एक भला मोठा सचित्र इंग्रेजी ग्रंथ महाराजांना अर्पण करून, हार तुरे दिले, ग्रंथ उलटताच हातात धरून महाराज पाने उलगडू लागले. ते लक्षात येताच बाबासाहेब म्हणाले - "महाराज. ग्रंथ उलटा धरलात."
महाराज : आरिचिभन, ह्योबि न्हाय आलं माज्या ध्येनात. आरऽऽबाऽसायब, हाय कुटं येवडं ग्यान आमाला तर उलटं सुलटं उमगायचं? वा, लइ छान गरांत लिवलास हां. न्हाय तर आमी. इलायतला जसं गेलो तसं हात हालवीत परतलो. आरं असली इदुत्तीची कामं तुमी श्येन्या बामनानीच करावी. न्हाय तर आमचं ह्यॅ मर्राटं, रानगट्टच्या रानगट्ट.
घोरपडे गेल्यावर महाराज माझ्याकडे वळले नि म्हणाले, "काय? `कोल्हापूरचा छत्रपती` कसा असतो, पाहिलास ना? रांगडा हेंगाड्या!" मी काय बोलणार? अशा गाठीभेटीत गावठी बोलीचे नाटक लहरीप्रमाणे वठवीत असले, तरी परिवारातल्या सेवकांपैकी कोणी अशुद्ध मराठी बोललेले कानावर पडले तर महाराज लगेच त्याला चमकवायचे नि शुद्ध बोलायला लावायचे.
आठवणीत आठवणी निघताच असे झाले. शाहू महाराजांचे संदर्भ ग्रंथाविषयी भाषण चालू असतानाच, श्रीमंत घोरपडे यांची आठवण मध्ये घुसली. पण तीही सांगणे भाग पडले. आता परत ती मुलाखत.
महाराजांची संदर्भ ग्रंथांची देणगी
महाराजांनी सांगितलेल्या संदर्भ ग्रंथांपैकी माझ्या संग्रही जवळ जवळ एकही ग्रंथ नाही, असे मी म्हणताच, महाराज एकदम दिवाणसाहेबांकडे वळून म्हणाले, "मुंबईतील काही ठळक बुकसेलर कंपन्यांना एक सर्क्युलर पत्र पाठवा, म्हणावं, ठाकरे तुमच्याकडून त्यांना लागतील ते ग्रंथ निवडून घेतील. ते त्यांना द्यावे आणि बिले दरबाराकडे पाठवावी. त्या पत्रांच्या प्रती याच्याजवळ द्या. (मला) तुला लागतील ते ग्रंथ या बुकसेलरांकडून घे आणि संदर्भ ग्रंथांचा ठीक अभ्यास करून तुझा ग्रंथ पूरा कर. (काही वेळ थांबल्यावर) बर. भिक्षुकशाहीच्या बंडाच्या किती प्रती छापणार आहेस?"
मी : पाच हजार. किंमत २॥ रुपये.
महाराज : ठीक. आमच्या दरबारासाठी आणखी जादा २ हजार प्रती छापा आणि त्याची किं. रु. ५ हजार जा आता घेऊन. आता नाक मुरडशील तर ते इथंच छाटले जाईल. मग पुढचं पुढं.
समर्थांपुढे काय अहंता करणार मी! प्रणिपातपूर्वक चेकचा मी स्वीकार केला. दीड-दोन महिन्यांत भिक्षुकशाहीचे बण्ड छापून झाले आणि महाराजांकडून काही हस्तलिखित पोथ्यांची बाडे घेऊन शंकराचार्य मठातले कै. गुण्डोपंत पिशवीकर दादरला आले असता, त्यांच्या बरोबर त्या ग्रंथाच्या २ हजार प्रती लगेच करून पाठविल्या. महाराजांनी आपल्या स्वराज्यातील दौऱ्यात त्या ठिकठिकाणच्या वाचनालयांना वाटल्या. बुकसेलरांकडून खरेदी केलेल्या विविध विषयक ग्रंथांनी माझा ग्रंथसंग्रह श्रीमंत झाला.
चेकाची देणगी दरबार कर्जात उमटली
शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांची कारकीर्द चालू झाली. त्या अमदानीत दरबारच्या खजिन्याची हिशोब तपासणी करण्यासाठी (ऑडिटिंग) मुंबई सरकारच्या अकौटण्ट जनरलचा एक हापसरवर्ग संस्थानात मागविला होता. अचानक एका दिवशी आमच्या हातात एक नोटीस पडली की तुम्ही दरबारचे ५ हजार रुपये कर्जाऊ घेतलेले आहेत, त्याची एक आठवड्यात फेड करावी. या यमाज्ञेला काय जाब देणार मी? क्षणभर बुचकळ्यात पडलो. त्या चेक प्रकरणी कसलीच काही लिखापढी झालेली नव्हती. आणि होण्याचे तरी कारण काय? महाराजांनी दिला नि आम्ही घेतला. त्याची दरबारी खजिनाखात्यात काय नोंद झाली, याची वास्तपुस्त करण्याचे मला कारण काय? बरे, त्याविषयी काही पत्रव्यवहार अथवा दस्तऐवजी पुरावाही नव्हता. फक्त मुंबईतल्या बुकसेलरांना पाठवलेल्या पत्रांच्या कार्बन प्रती माझ्याजवळ ऐनवेळी सापडल्या. राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत दिवाणसाहेब सर सबनीस सेवानिवृत्त झालेले आणि अण्णासाहेब त्या गादीवर आलेले. त्यांना मी एक पत्र पाठविले आणि चेक प्रकरणी साहेबांची साक्ष काढली. त्या पत्राची एक नक्कल सर साहेबांनाही पाठविली. त्यांनी अण्णासाहेबांना समक्ष बोलावून खरा प्रकार सांगितला. तेव्हा ते कर्जप्रकरण `ग्रंथकारास सन्मानाचे अनुदान` सदरात प्रविष्ट झाले.
न्यूनगंडाचे निर्दाळण
प्रथम केले पाहिजे. मागासलेल्या सर्व समाजांच्या उद्धाराचा हाच एक मार्ग, आणि त्याचा श्रीगणेशा शिक्षणप्रसाराने काढला पाहिजे, या एकाच धोरणाने छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व पत्करले. हे कार्यसुद्धा यक्षिणीच्या कांडीसारखे अल्पावधीत साध्य होणार होते थोडेच? श्रवण, मनन आणि निदिध्यास या तीन अवस्थेतून नाक्षर समाजांना आस्तेआस्ते नेणे जरूर होते. पुणे, बडोदे, कोल्हापूर, सातारा वगैरे ठिकाणच्या काही मराठे मंडळींनी वृत्तपत्रे काढून समाजात जागृतीचा नेटदार यत्न चालविला. पण साक्षरतेचाच जेथे ठावठिकाणा नव्हता, तेथे या उपक्रमाची पावले कितीशी परिणामकारक होणार? त्यासाठी महाराजांनी `सत्यशोधक जलशांची कल्पना` काढली आणि ती मात्र खेडुती जनसमुदायाच्या न्यूनगंडाच्या निर्दाळणाला हुकमेहुकूम फलदायी ठरत गेली. शहरी मंडळी नाट्यप्रयोगांच्या परवडी रचून, स्वतःच्या सांस्कृतिक उच्चतेचे कितीही प्रदर्शन करीत असली तरी खेडूत जनतेला त्यात कधीही फारसा रस घेता आला नाही. त्यांचा सारा ओढा तमाशाकडे. तमाशातल्या कड्याचा कडकडाट कानी पडला रे पडला का खेडुती शेतकरी पुढ्यातला जेवणाचा थाळा दूर लोटून, मुंडासे सावरीत धावलाच त्या आवाजाच्या रोखाने, असे कितीतरी देखावे मी पाहिलेले आहेत. खेडुती मनोवृत्तीचे हे बिंग हुडकूनच महाराजांनी सत्यशोधक जलशांना उत्तेजन दिले.
तोवरच्या तमाशात शृंगारिक भागच मुख्य असायचा. तो वगळून, शिक्षणाची आवश्यकता, त्याचे फायदे, सामाजिक नि धार्मिक कित्येक रूढींचा फोलपणा, त्यांच्या भांडवलावर भिक्षुकांनी गावोगाव चालविलेली आपमतलबी लूटमार, लग्नकार्यातला अनाठायी खर्च, मारवाडी नि सावकारी करणारे, यांनी लोकांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन त्यांची शेतीवाडी, घरेदारे, गुरेढोरे स्वाहा करण्याचे चालविलेले कायदेशीर नि वायदेशीर कारस्थाने, इत्यादी अनेक विषयांवर जलसेवाल्यांनी साग्रसंगीत प्रहसने नि फार्स रचून, गावोगाव विचार-क्रांतीचा धूमधडाका चालू केला. अस्पृश्यता विध्वंसनावर जलशांचा जोर विशेष असायचा. या विशेष आंदोलनाचा परिणाम शहरी विचारवंत बामणांवर जबरदस्त होऊ लागल्यामुळे, जातीजातींत वैमनस्य फैलावण्याच्या १५३-अ कलमावर बोट ठेवून, त्या चळवळ्यांचा बंदोबस्त करण्याविषयी, सरकारला वृत्तपत्री चिथावण्या देण्याच्या खटपटी त्यांनी बऱ्याच केल्या. अर्थात त्या चिथावण्यांना रोखठोक जाब द्यायला मराठ्यांची वृत्तपत्रे कलम सरसावून सज्ज तयारच असत.
विवाहविधीतली क्रांतिकारक सुधारणा
`देव आणि मानव यांत दलाल नको`, हे ज्योतिराव फुल्यांच्या सत्यसमाजाचे एक अग्र तत्त्व. यच्चयावत् धार्मिक बाबतींत बहुजन समाजांनी ते कटाक्षाने पाळण्याचा उपक्रम गावोगाव होऊ लागला. वैवाहिक बाबतीत म. फुल्यांनी भिक्षुक-बहिष्काराचा जो यत्न केला, त्यात त्यांना एका फिर्यादीला तोंड द्यावे लागले होते. "तुमच्या जमातीत लग्न कोण लावतो?" या प्रश्नाला "नवरा नवरीशी लग्न लावतो" असा जबाब त्यांनी दिलेला होता. "तुमची जात कोणती?" या प्रश्नाला "माझी जात माणूस" असे उत्तर दिले होते. सत्यशोधक जलशांमुळे गावोगाव भिक्षुकांच्या मध्यस्तीशिवाय, साध्या हारांच्या अर्पणावर खेडुतांची लग्ने सर्वत्र साजरी होऊ लागल्यामुळे, भिक्षुक वर्गात मोठीच खळबळ उडाली. ठिकठिकाणी जोशी वतनाच्या हक्काच्या जोरावर तसली लग्ने करणारांवर फिर्याद होऊ लागल्या. त्यांच्या बातम्या ब्राह्मणेतरी वृत्तपत्रांत येताच, शाहू महाराजांनी धडाधड त्या त्या ठिकाणच्या ब्राह्मणेतर वकिलांना आणि तसा तेथे कोणी नसल्यास, हाताजवळच्या भास्करराव जाधवांनाही, ते खटले लढवायला खर्चवेच देऊन रवाना करण्याची तरतूद चालू केली. जलशेवाल्यांवरही खटले होऊ लागले. तेव्हा भाऊराव पाटोळे नावाच्या एका जलशेवाल्याने, तो करीत असलेल्या प्रहसनादी प्रयोगांची पुस्तकेच छापून काढली. पोलिसांकडून किंचितही विचारणा झाली, तर "घ्या हे पुस्तक हातात नि बसा परीक्षण करीत आमच्या जलशाच्या प्रयोगाचे", असे तो ठणकावून सांगायचा. खेड्यापाड्यातले नाक्षर शेतकरीही आता सावकार, कुळकर्णी, भिक्षुकांशी सडेतोड जाबसाल करू लागल्यामुळे, त्या सर्व अनर्थाचे मूळ करवीरकर छत्रपतीच, हा सिद्धान्त शहरी पंडितांच्या मनोमनी जाम ठसल्यामुळे, छत्रपतींच्या द्वेषाबरोबरच या आंदोलनातल्या कार्यकर्त्यांना या ना त्या निमित्ताने अद्दल घडविण्याची कारस्थाने शिजू लागली.
छत्रपतींना मुंबई सरकारचा इशारा
"महाराजांनी आपल्या संस्थानच्या हद्दीत हवी ती चळवळ करावी, पण खालसा महाराष्ट्रात तिचा वणवा भडकविण्याचा त्यांना काय अधिकार?" पुण्याच्या एका वजनदार पत्राने विचारलेल्या प्रश्नाला आणि तो महाराजांना सुचविणाऱ्या सर ली वॉर्नर यांना महाराजांनी दिलेले रोखठोक लेखी उत्तर, आजच्या विवेकवादी मंडळींनीही शांतपणे विचार करण्यासारखे आहे. ते असे :
"मी ब्राह्मणांच्या विरुद्ध भाषणे केलेली नाहीत, अगर दुसरे काहीही केलेले नाही. पण आपल्या स्वभावास अनुसरून ते माझ्यावर सूड उगवीत आहेत. त्यांच्या पेशवाई बर्वेशाही किंवा परशुरामशाही कारस्थानांना परमेश्वर यश देवो! मी तुमचा उपदेश ऐकेन, पण क्षत्रियाला अनुचित अशा रीतीने मला वागता येणार नाही. मला कैद केले तरी माझा देह कोणत्या तरी सत्कारणी खर्चण्याचा मी प्रयत्न करीन. ज्या रणभूमीवर मी उभा राहिलो आहे, तेथून पाय मागे घेणे माझ्या शीलास डाग लावण्यासारखे आहे. मी तुमचा उपदेश स्वीकारीन पण त्याप्रमाणे वागणे मला अशक्य आहे. लॉर्ड..... यांनीच काय पण खुद्द ब्रह्मदेवाने अथवा यमाने मला धमकी घातली, तरी त्याची मला पर्वा नाही. माझा स्वभाव तुम्हाला बदलता येणार नाही. भित्र्या भागूबाईप्रमाणें मी माझी मते सोडणार नाही. किंवा जीव बचावण्यासाठी देखील शरण जाणार नाही. मी तुटेन पण वाकणार नाही. जपमाळ ओढीत बसून भटजीप्रमाणे मी कालक्षेप करणार नाही. सरकार रागावेल असे तुम्ही म्हणता. रागावो बिचारे! मला त्रास होईल यात संशय नाही. परंतु गरजवंताना मदत केल्याबद्दल, अस्पृश्यांना हात दिल्याबद्दल आणि मराठ्यांचा उद्धार करण्याकरिता माझी शक्ती खर्च केल्याबद्दल परमेश्वराकडून खचित मला न्याय मिळेल. माझ्या पूर्वजांचे स्मरण करून मी तुम्हास सांगतो की क्षत्रियाला अयोग्य असे काहीही मी करणार नाही. माझ्या आईच्या नावाला मी काळिमा लावणार नाही. तुमचे धोरण मला मान्य नाही."
सार्वजनिक चळवळींचे कंत्राट घेतलेल्या जबरदस्त बुद्धिमंतांचे, महाराजांना एनकेन प्रकारेण पदच्युत करण्याचे कारस्थान, या रोखठोक जबाबाने सपशेल ढासळले. असे काही मनस्तापाचे प्रकरण असले, का महाराज मुंबईला येताच मला हापिसात फोन करून मुद्दाम भेटीला बोलावीत असत. या प्रकरणाच्या भेटीत पदच्युततेचा मुद्दा बोलण्यात निघाला, तेव्हा महाराज म्हणाले, "पदच्युतीच्या धमक्यांना आम्ही थोडेच भीक घालणार? प्रिन्सेस चेम्बरामध्ये मीच ते बिल पास करून घेतले आहे की कोणताही राजा मरण पावला अगर पदच्युत झाला, तर सरकारच्या परवानगीची जरूर न लागता, त्याचा औरस राजपुत्र तात्काळ गादीवर बसण्याचा अधिकारी असणार. मला पदच्युत केले तर काय ब्रह्मांड कोसळणार? युवराज बसेल गादीवर आणि मी सर्वस्वी वाहून घेईन बहुजन समाजाच्या उद्धारकार्याला. आज छत्रपती म्हणून काही बंधने तरी आहेत मला. मोकळा झाल्यावर मग हो काय? जनता नि. मी. जीवात जीव मिसळून उद्धाराचा रस्ता नेटाने काटता येईल."
प्रकरण १२
प्रबोधन पाक्षिकाचा जन्म कसा झाला
सन १९२१ सप्टेंबरात वृत्तपत्र काढण्याचा माझा निश्चय ठरला. पण त्यावेळी मी सरकारी नोकरीत होतो आणि सरकारी नोकराला पुस्तके लिहिण्याची, छापण्याचीच बंदी होती, तेथे वर्तमानपत्र काढणार कसा? मुंबई सरकारच्या इलेक्ट्रिक पी. डब्ल्यू. डी. कचेरीत त्यावेळी हेडक्लार्क, रेकॉर्ड सेक्शन, म्हणून मी काम करीत होतो. या कचेरीच्या रेकॉर्डांची मनस्वी गदळ झालेली होती. त्यावर ऑडिटरचे कडकडीत शेरे दरसाल पडत होते. सरकारचे कार्य इंडेक्स एक्सपर्ट अडरसन साहेब आठवडाभर कचेरीत बसून, उपायांवर उपाय शोधून गेले. मी एक योजना सुचविली. ती सरकारकडे तपासणीला गेली. प्रयोगही करून दाखविले. ती आल्फा-न्युमेरिकल कार्ड-इंडेक्स सिस्टीम मान्य झाली नि ते खाते निराळे करून त्यावर हेडक्लार्क म्हणून माझी नेमणूक झाली. अवघ्या ३-४ महिन्यांत रेकॉर्डांचा सारा घोळ मी लायनीला लावला. वर्ष दीड वर्षांनी वृत्तपत्र काढण्याची कल्पना बळावली. सरकारी नोकर म्हणून जर ते चालू करता येत नसेल, तर राजीनामा देणे आवश्यक. मेंटीथ साहेबाला हे सांगितले. त्याने सेक्रेटरिअटच्या अधिकाऱ्यांचा सूर घेतला. नकार मिळेल तर आम्हाला एक `इनडिस्पेन्सिबल` ऑफिसर गमवावा लागेल, हे स्पष्ट सांगितले. अखेर मला चीफ सेक्रेटरी अल. रॉबर्टसन् यांनी मुलाखतीला बोलावले. "सर सरकारी नोकराने लेखन प्रकाशन करू नये, हे ठीक आहे. मग आतापर्यंत मी कितीतरी वर्तमानपत्रांत नावाने लिहीत आहे. स्वतः ४-५ ग्रंथही पब्लिश केले आहेत. आजवर तुमच्या सीआयडींनी का नाही तसा रिपोर्ट केला?" असे स्पष्ट सांगून, राजीनाम्याची तयारी दाखविली. बरेच बोलणे झाले. अखेर एका सरकारी ऑर्डरने मला वृत्तपत्र काढण्याची खास परवानगी देण्यात आली. मात्र त्यात "धिस मस्ट नॉट बी ट्रीटेड अॅज ए प्रीसिडण्ट" (पुन्हा अशा रीतीने कोणाला परवानगी देण्यात येऊ नये) ही अट ठळक घालण्यात आली. कर्दनकाळ ब्रिटिश सरकारच्या अमदानीत सरकारी नोकरीत असताही, वर्तमानपत्र काढण्याची खास परवानगी मिळविणारा, मला वाटते, मीच पहिला नि अखेरचा गवर्नमेण्ट सर्वण्ट आहे.
शाहू महाराजांवर पहिला टीकाप्रहार
सन १९२१ च्या आक्टोबरात कोल्हापुरात एक विचित्र घटना घडली. अंबाबाईच्या गामाऱ्यात शिरून काही मराठा जातीय विद्यार्थ्यांनी अंबाबाईची पूजा केली. महाराजांनी ताबडतोब तेथील एका हायस्कुलातील काही मराठा विद्यार्थ्यांना पकडून लॉकअपमध्ये डांबल्याची बातमी वर्तमानपत्रात आली. त्यावर प्रबोधनच्या दुसऱ्याच (दि. १-११-२१) अंकात `अंबाबाईचा नायटा` या मथळ्याचे एक स्फुट मी लिहिले. महाराजांचा नि माझा ऋणानुबंध पहाता, त्यांच्यावर मी कधी काही टीका टिपणी करायला धजेन, अशी कोणाचीच कल्पना नव्हती. ते स्फुट असे :
अंबाबाईचा नायटा
"नायटा केव्हाही झाला तरी वाईटच. त्यातल्या त्यात अंबाबाईचा नायटा म्हणे फारच वाईट! कोल्हापूरची इतिहासप्रसिद्ध अंबाबाई अनेक शतकांचा आपला बौद्धपणा टाकून कोल्हापुरी चळवळ्यांच्या चळवळीत आपल्या चिडचिडणाऱ्या नायट्याची चुरचुरीत फोडणी घालण्यासाठी आता जागृत झाली आहे. हे अंबाबाईचे देवस्थान मोठे जागृत खरे! काही दिवसांपूर्वी दोनतीन मराठे जातीच्या मुलांनी गाभाऱ्यात जाऊन या जागृत अंबाबाईची भिक्षुकाच्या मध्यस्तीशिवाय पूजा केली. या गोष्टीमुळे भिक्षुक पुजाऱ्यांनी `अंबाबाई विटाळली` असा भयंकर कोलाहल केला. मराठा? ब्राह्मणेतर? आणि त्यांच्या पोरांनी या भिक्षुकशाहीच्या तुरुंगातल्या शुद्ध अंबाबाईची स्वतः पूजा करून तिला अशुद्ध करावी? कोल्हापुरापासून पुण्यापर्यंत एकच हाहाकार उडाला. `राष्ट्रीय` केसरीकारसुद्धा अंबाबाईच्या या विटाळाला `भयंकर अत्याचार` मानून, आपल्या मामुली विवेकभ्रष्टतेच्या हुंदक्यात मोठमोठ्याने हेल काढून रडू लागले. भिक्षुकशाहीच्या कंपूत एवढ्या जबरदस्त निराशेच्या धरणीकंपाचे धक्के बसू लागले की ज्या इंग्रेजी सरकारला त्यांनी `सैतानी` ठरविले आहे, त्यांचे बूट चाटण्यासाठी भिक्षुकी जिव्हा तारायंत्रातून भराभर लांबलचक झाल्या... आम्हांला फार आशा होती की या अंबाबाईच्या नायट्याच्या बाबतीत करवीरकर छत्रपती काही मुत्सद्देगिरी दाखवितील.
परंतु ज्या मराठा समाजाचे ते `जन्मसिद्ध` नायक आहेत, ज्या समाजाचा, राजकीय, सामाजिक व विशेषतः धार्मिक दर्जा उन्नतावस्थेला नेण्याचे कर्तव्यकंकण महाराजांनी उघड उघड आपल्या हाती चढविले आहे, आणि ज्यांनी क्षात्र जगद्गुरुच्या एका नवीनच पीठाला निर्माण करण्याची धडाडी व मनोधैर्य प्रत्यक्ष दाखविले आहे, त्या छत्रपती सरकारने आपल्या पोलीस खात्याकडे अंबाबाईचा हा नायटा बरा करण्याची कामगिरी सोपविलेली पाहून फार वाईट वाटते. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या अनेक पत्रव्यवहारावरून आता असे समजते की या कोल्हापुरी पोलिसांनी नुकतेच तेथील हायस्कुलातून काही मराठे जातीचे विद्यार्थी अंबाबाईच्या नायट्याच्या संशयाने पकडून नेले आहेत. ही गोष्ट जर खरी असेल तर ती अस्पृश्योद्धार करण्याच्या कामी सक्रीय मनोधैर्य दाखविणाऱ्या छत्रपती सरकारच्या चारित्र्याला कलंकित करणारी आहे. ही राजनीती नव्हे, समाजनीती नव्हे व धर्मनीती तर नव्हेच नव्हे. मुख्य वादाचा प्रश्न एवढाच की अंबाबाई ही हिंदू धर्माची एक देवता आहे, तिचे देऊळ जैनांनी बांधलेले असो नाहीतर बौद्धांनी खोदलेले असो, ते हिंदू देवतेचे देऊळ आहे. अर्थात हिंदू म्हणविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मग ती ब्राह्मण असो, क्षत्रीय, वैश्य, शूद्र असो, ब्राह्मणेतर किंवा ब्राह्मणेतरेतर असो - त्या देवतेची पूजाअर्चा स्वतः करण्याचा अधिकार आहे. हा अधिकार ज्या देवळांत मान्य केला जात नाही, जेथले देव व देवता या भिक्षुकी जेलरांच्या तुरुंगवासात खितपत पडल्या आहेत, ज्यांचे पूजन मराठ्यांसारख्या उच्चवर्णीय क्षत्रियांसही करता येत नाही, जेथे दुराग्रही जातिभेद नाठाळ पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे महाद्वारावर ब्राह्मणेतरांवर बेगुमानपणे तुटून पडत आहे, असल्या देवळांना पवित्र धार्मिक स्थाने समजण्यापेक्षा उनाडटप्पूंचे पांजरपोळ मानायला काही हरकत नाही, आणि असल्या या भिक्षुकी तुरुंगात पडलेल्या देवांना व देवतांना सडकेवरच्या मैल फर्लांगदर्शक दगड धोंड्यापेक्षा फाजील महत्त्वही कोणी देऊ नये. ज्या अंबाबाईला भिक्षुकांची कैद झुगारून देता येत नाही, ती अंबाबाई आम्हा दीन दुबळ्यांचे भवपाश तोडणार ती काय! ही शोचनीय दु:स्थिती पाहिली म्हणजे हिंदू देवळे जमीनदोस्त करणारे अफझुलखान औरंगजेब एक प्रकाराने मोठे पुण्यात्मे होऊन गेले, असे वाटू लागते."
शाहू महाराज मला आता बोलवणार नाहीत नि भेटणारही नाहीत, असा अनेकानी तर्क केला. पण कसचे काय नि कसचे काय! पुढच्याच आठवड्यात स्वारी मलबार हिल शिरीरोडच्या खाली माझी हापिसातून येण्याची वेळ साधून गाडीत बसलेली. शोफरने मला बिनचूक हेरून "महाराज बोलावताहेत, चला" म्हणून गाडीकडे नेले. "बस गाडीत." बसलो. पन्हाळा लॉजवर आलो. कोणाला वर पाठवू नका, असा दरवानाला महाराजांनी हुकूम दिला. बैठक बसली. "काय ल्योका कोदंडा, लई वांड झालास?" महाराजांचा पहिला सवाल तो कसा? "मी विचारले. त्यावर त्या स्फुटावर बरीच चर्चा झाली. "अरे, एकदम साऱ्या गोष्टी साधत नाहीत. आस्ते आस्ते, सगळाच बंदोबस्त मी करणार आहे." यापेक्षा विशेष कसलाच काही थांगपता लागू दिला नाही. पण केलेल्या टीकेबद्दल मात्र त्यांनी मनाला काहीच लावून घेतले नाही, असा स्पष्ट खुलासा झाला.
छत्रपतींना हा अधिकार असतो काय ?
आमच्या संस्थानातील धर्मपीठावरील पीठाधिकारी नेमण्याचा अधिकार छत्रपतींना असतो काय? असा एक सवाल शाहू महाराजांनी मुंबईतल्या एका बैठकीत (सन १९२०) मला विचारला होता. मी `होय` म्हणून तात्काळ उत्तर दिले. किंचित चमकल्यासारखे होऊन, "अरे, जा रे, जाधवरावांना बोलावलंय म्हणून सांग", असा हुजऱ्याला हुकूम दिला. "याला पुरावा काय?" महाराज म्हणाले, "पुरावा रावबहाद्दर वाडांच्या बाडातला. समर्थ रामदासांचे पट्टशिष्य कल्याणस्वामी समाधिस्त होताच, गादीवर कोणी बसावे, या बाबतीत तेथल्या शिष्यगणांत मनस्वी भांडाभांड दंगल झाली. प्रकरण मारामारीपर्यंत जाऊन, कित्येकांची डोकी फुटली. ही बातमी सातारला छत्रपती शाहू महाराजांपर्यंत जाताच, त्यांनी तात्काळ "आम्ही जातीने येऊन काय तो निर्णय ठरवू", असा तातडीचा संदेश गडावर पाठवला. त्याप्रमाणे छत्रपती गडावर गेले. चौकशी केली. "श्रेष्ठांच्या वंशातील कोणी आहेत काय? असल्यास आमच्यासमोर त्यांना हजर करा." वंशज येऊन दाखल झाले. समर्थांच्या गादीवर बसायला कोण तयार आहे? असा प्रश्न टाकला. जो तो कांकू करू लागला. मुख्य अडचण होती काटेकोर ब्रह्मचर्याच्या व्रताची! महाराजांपुढे ती मांडण्यात आली. "ठीक आहे. आम्ही ती अडचण दूर करतो, या गादीवरील मठाधिपतीने विवाह केला तरी चालेल." अडचण दूर होताच एक मुलगा तयार झाला. श्रीफळ महावस्त्र अर्पण करून, छत्रपतींनी त्याची समर्थांच्या गादीवर अधिपती म्हणून नेमणूक केली आणि `आमच्या स्वराज्यातील कोणत्याही धर्मपीठावरील अधिपती नेमण्याचे अधिकार छत्रपतींचे आहेत. त्याप्रमाणे घालावे.` असा लेखी हुकूम ज्यारी केला."
"काय जाधवराव, तुम्ही तर कानांवर हात ठेवले होतेत, पण कोदंडाने दिलाच ना पुरावा काढून?" महाराजांच्या या टोमण्यावर जाधवरावादी आम्ही सगळेच हसलो. संध्याकाळी पन्हाळा लॉजवर पुराव्याचे पुस्तक पाठवून दिले.
या घटनेपूर्वी करवीर शंकराचार्यांच्या पीठावर महाराजांनी डॉ. कूर्तकोटींची स्थापना केली होती आणि त्याबद्दल केवळ भारतातूनच नव्हे, तर इंग्लंड अमेरिकेतून शाहू महाराजांवर अभिनंदनाचा वृत्तपत्री वर्षाव झाला होता. पण वरील प्रश्न नेमका काय हेतूने त्यांनी विचारला, त्याचे इंगित मात्र माझ्या, जाधवरावांच्या किंवा दिवाणसाहेबांच्या अटकळीत त्यावेळी मुळीच आले नाही. एक वर्षाने (सन १९२१) त्या गूढाचा उलगडा झाला तो असा.
क्षात्र जगद्गुरूंच्या पीठाचा जन्म
वृत्तपत्रात अचानक एके दिवशी बातमी झळकली की अखिल मराठा जमातीच्या उद्धारासाठी छत्रपती शाहू महाराजांनी क्षात्र जगद्गुरूंच्या नवीन पीठाची स्थापना करून, त्यावर इण्टरपर्यंत शिकलेल्या बेनाडीकर पाटील नावाच्या एका तरुण मराठ्याची स्थापना केली. त्यासाठी कोल्हापूर येथे राजेशाही थाटाचा समारंभ झाला. तोवर शाहू महाराजांच्या फारसे मेहरबानीत नसणारे अण्णासाहेब लठ्ठे त्या दरबाराला हजर होते आणि विशेष म्हणजे, क्षात्र जगद्गुरूंना मराठा उपाध्यांनी वैदिक मंत्रांनी अभिषेक केल्यानंतर, लागलीच स्वतः अण्णासाहेबांनी सोन्याने मढविलेल्या गव्याच्या शिंगातून क्षात्र जगद्गुरूंच्या चरणांवर समंत्रक जलधारांचा निराळा अभिषेक केला.
भास्करराव जाधवांचा तत्त्वाभिमान
सर्व विधी यथासांग उरकल्यानंतर, खुद्द शाहू महाराजांनी क्षात्र जगद्गुरूंसमोर जाऊन, कंबर वाकवून, तीनदा मुजरा केला. इतकेच नव्हे, तर दरबारात जमलेल्या यच्चावत असामींनी तसेच मुजरे करावे, असे तोंडी फर्मान सोडले. सर्वांनी केले, पण जाधवराव मात्र बसल्या जागचे मुळीच हलले नाहीत, कोणी तरी कुचाळ्याने ती गोष्ट महाराजांच्या नजरेला आणली. "जाधवराव, मुजरा", महाराजांनी डरकाळी फोडली.
जाधवराव : (शांतपणे) छत्रपती महाराज, आपण छत्रपती म्हणून एक सोडून शंभरदा मी आपले मस्तक आपल्यापुढे अगत्य वाकवीन. पण एक प्रामाणिक सत्यशोधक आणि स्वर्गस्थ महात्मा ज्योतिराव फुल्यांचा इमानी शागीर्द या नात्याने, जगद्गुरू, त्यांचे पीठ या संस्थाच मला अमान्य आहेत. सबब मुजरा करण्याचे मला काही कारण नाही.
छत्रपती : माझ्या आज्ञेची अवज्ञा? चालते व्हा इथनं.
महाराजांना लवून तीनदा मुजरा करून, "जशी छत्रपतींची आज्ञा" असे म्हणून जाधवराव बाहेर पडले. सगळ्या दरबारात खळबळ उडाली. आता कोल्हापुरातून जाधवरावांची कायम हकालपट्टी होणार, असे जो तो एकमेकांत बोलू लागला.
दरबार आटोपताच काही वेळाने महाराजांची गाडी जाधवरावांच्या बंगल्यासमोर आली. जाधवरावांना हाक मारली. तात्काळ ते गाडीजवळ गेले. मजुरा केला. "या बसा गाडीत.`` हुकूम झाला. जाधवरावांना घेऊन गाडी निघून गेली. राजवाडयात गेल्यावर...
महाराज : जाधवराव, शाब्बास. भर दरबारात महात्मा फुल्यांच्या सत्य तत्त्वांचा एवढा करारीपणा दाखविलात तुम्ही. मला फार आनंद झाला. आमच्या संस्थानात तुमच्यासारखे सडेतोड निस्पृही आहेत, याचा आम्हाला फार अभिमान आहे, समजलात. जावा आता घरी.
क्षात्र जगद्गुरू पीठाबद्दल प्रतिक्रिया
महाराजांच्या या खटाटोपामुळे, शेकडो विवेकवादी सुधारकांत आस्तिनास्ति विचारांचे आंदोलन चालू झाले. अनेक सुबुद्ध मराठा विचारवंतांनाही ती घटना आवडली नाही. तशात "क्षात्र म्हणजे मराठे", असा आणखी एक खुलासा महाराजांनी जाहीर केलामुळे तर ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाच्या जोडीला हा एक नवा मराठा-मराठेतर भेद निर्माण झाला, हा कित्येकांचा तर्क पुढे खरा ठरला. या प्रकरणाबद्दल दि. १६-१-१९२२ च्या प्रबोधनात "मानसिक दास्याविरुद्ध बण्ड" लेखमालेत स्पष्ट मांडलेल्या विचारांचा एक भाग :
"...ब्राह्मण जगद्गुरूचे दास्य नको म्हणून क्षात्र जगद्गुरूचे पीठ निर्माण करणे, म्हणजे जुन्या गुलामगिरीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी नव्या गुलामगिरीचे जोखड पत्करण्यासारखे आहे. समाजोन्नतीसाठी किंवा धर्मोन्नतीसाठी शंकराचार्यांचा एक मठच पाहिजे, त्यावर एक मठपतीच पाहिजे, ही कल्पनाच मुळी मानसिक दास्याची स्पष्ट स्पष्ट निशाणी आहे. गुलामगिरीचा नायनाट गुलामगिरीने होत नसतो. शिवाय, वर्णाश्रमवादी ब्राह्मण जगद्गुरूच्या मानसिक दास्यप्रवर्तक भिक्षुकशाहीला जमीनदोस्त करण्यासाठी थेट तसल्याच तत्त्वांवर उभारलेल्या क्षात्र जगद्गुरूच्या मठाला निर्माण करणे, म्हणजे जोखडासाठीच देवाने आपल्याला मान दिलेली आहे, ही कल्पना दृढमूल झालेल्या बैलाने नाऱ्या तेल्याच्या पाण्याला रामराम ठोकून पिऱ्या तेल्याच्या गोंडस घाण्याला स्वतःस जुंपून घेण्यासारखे आहे.
मठ आला की मठाधिपति आले; मठाधिपती आले का सांप्रदाय सुरू झाला; सांप्रदायाच्या मागोमाग सांप्रदायिक गुलामगिरी ठेवलेलीच. अर्थात क्षात्र जगद्गुरूच्या मठाचा अनाठायी खटाटोप करणारे आज जरी या नवीन परिस्थितीत काही समाधान मानीत असतील, तरी निदान व्यक्तिप्रामाण्याची मुर्वत राखण्यासाठी त्यांना कालवशात एका नवीन स्वरूपाच्या भिक्षुकशाहीच्या गुलामगिरीत जखडून पडल्याशिवाय गत्यंतरच उरणार नाही."
या लेखाने मराठा मंडळात खूपच खळबळ उडाली. काही मराठा पत्रकारांनी तर `ठाकरे आपले नव्हते` येथवर इषाऱ्याची लांबीरुंदी ताणली. ब्राह्मणेतर बहुजन समाजाच्या उद्धाराचे कंकण बांधलेल्या शाहू महाराजांच्या हरएक कृत्याला सविनय मान डोलावणे, हेसुद्धा व्यक्तिप्रामाण्याच्या गुलामगिरीला बिनशर्त मान वाकविण्याइतकेच लाजिरवाणे आहे. याची त्या आक्षेपकांना शुद्धच राहिली नाही.
काही दिवसांनी महाराज मुंबईला आले असताना नेहमीप्रमाणे आमची बैठक झाली. प्रबोधनातील लेखाचा विषय निघाला. "महाराज, हा नवीन क्षात्रपीठाचा उपद्व्याप अखेर ब्राह्मणेतरी संघटनेला भोवल्याशिवाय राहणार नाही. तशातच आपण क्षात्र म्हणजे फक्त जातीय मराठे, हा खुलासा केल्यामुळे तर अफाट मराठेतर बहुजन समाजाच्या विश्वासाला आपण जबरदस्त धक्का दिलात. त्यांना किंवा कोणालाही धर्मपीठाची - जुन्या अगर नव्या-गरज नाही. त्यांना धर्मोद्धार नको. त्यांना कर्मोद्धार हवा. एकीकडे सत्यशोधक तत्त्वांची तळी उचलून धरायची आणि दुसरीकडे खास मराठा जातीयांसाठी क्षात्रगुरूचे नवीन धर्मपीठ उभे करायचे, या भानगडीचा आदी अंत आपणच जाणे."
असा सडेतोड सवाल महाराजांपुढे टाकताच, बराच वेळ ते विचारमग्न राहिले. नंतर म्हणाले, "तू म्हणतोस ती डेंजर्स आहेत खरी. पण मी त्यांचा पुरता बंदोबस्त करणार आहे. सत्यशोधक समाजाच्या पाठोपाठ आर्यसमाज येऊन मला चिकटला आहे. काहीतरी तडजोड काढावी लागेल."
स्वराज्यद्रोही छत्रपती
टिळकांच्या मागे छत्रपती आणि करवीरांविषयीचा द्वेष पुणे सातारा प्रांतीच्या वृत्तपत्रांत मनस्वी बोकाळला. नरसोपंत केळकरांनी `स्वराज्यद्रोही छत्रपती` मथळ्याचा अग्रलेख केसरीत लिहिल्यामुळे महाराष्ट्रातला ब्राह्मणेतर बहुजन समाज विलक्षण खवळून गेला. गावोगाव सभा भरू लागल्या. निषेधाचा वणवा भयंकर पेटला. त्याच सुमाराला अहमदनगर जिल्ह्यातील तरवडी येथील `दीन मित्र` साप्ताहिकाचे संपादक रावसाहेब मुकंदराव पाटील यानी `कुलकर्णी लीलामृत` नावाचे एक विनोदी कवितांचे पुस्तक छापले. त्यावरही केसरीत अभिप्राय देताना सरकारला ते पुस्तक जप्त करण्याची बुरखेबाज चिथावणी देण्यात आली. त्यामुळे आगीत आणखी तेल ओतल्यासारखे झाले. ब्राह्मणब्राह्मणेतर वाद सर्वत्र भयंकर भडकला. पुण्याला भवानी पेठेत शाहू महाराज सभेला आले असताना, त्यांच्यावर धोंडमार करण्यात आली. लोकांनी कुचाळखोरांना जागच्या जागी पकडून बराच ठोक दिला. दोन्ही पक्षांची वृत्तपत्रे एकमेकांची उणीदुणी काढण्यात भडकली. परस्परविरोधी हस्तपत्रिकांचा पुण्याच्या पेठापेठांतून रस्तोरस्ती सडा पडला.
"म्हंजे? मीच काही एकटा छत्रपती नव्हे तर!"
नेमक्या याच खवळलेल्या मनःस्थितीत पन्हाळा लॉजवर माझ्या मुलाखतीचा योग आला. ब्राह्मण पेशव्यांचे राज्य गेले आणि मराठा संस्थानिकांची संस्थाने जिवंत राहिली, हा ब्राह्मणी मनोवृत्तीतला उद्रेकच त्यांच्या छत्रपतीद्वेषाला कारण असेल काय? या मुद्यावर महाराज बोलत होते. भाषणात वेदोक्त प्रकरण, सत्यशोधक चळवळ, जोशी वतने वगैरे संबंधित मुद्दे होतेच. बोलण्याच्या ओघात "ब्राह्मण हात धुऊन पाठीशी लागलेला छत्रपती, मला वाटतं, मी असेन काय हो?" असे महाराजांचे उद्गार बाहेर पडताच, "आपल्यापेक्षाही भयंकर छळाला सातारच्या छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी तोंड दिलेले होते..."
छत्र : प्रतापसिंह? म्हणजे आमचे बुवासाहेब महाराज की काय?
मी : होय, तेच ते. त्यांचा इतिहास वाचाल, ऐकाल, तर म्हणाल त्यांच्या छळापुढे हा छळ दर्यामे खसखस. महाराष्ट्रात पहिला निःशस्त्र सत्याग्रह त्याच वीराने केला. आपल्याला तो इतिहास माहीत नसावा.
"मग सांग की तो" अशी महाराजांनी आज्ञा करताच, तब्बल दोन तास सातारच्या राज्यक्रांतीच्या कहाणीवर मी एकतान प्रवचन केले. एकेक मुकाबला जसजसा रंगत गेला, तसतसे महाराज आणि दिवाणसाहेब पाणावलेल्या डोळ्यांनी पुढच्या घटनांचा कथाभाग ऐकायला उत्सुक होत गेले. कहाणी संपली आणि काही वेळ आम्ही तिघेही एकमेकांकडे पहात स्वस्थ राहिलो.
"भयंकर इतिहास आहे हा म्हणायचा!" महाराज अखेर उद्गारले. "अजूनपर्यंत आम्ही आपलं समजत होतो की बुवासाहेब महाराजांनी खरोखरच इंग्रेजांविरुद्ध काही कट केला, म्हणून त्यांना पदच्युत नि हद्दपार करण्यात आले. हा इतिहास लिहून छापून बाहेर पडलाच पाहिजे."
मी : सध्या अलाहाबादचे विख्यात इतिहासकार मेजर बी. डी. बसू इंग्रेजीत तो लिहीत आहेत. नुकतेच ते मला भेटून गेले आणि त्यांना मी माझ्या संग्रहातले बरेचसे मराठी-मोडी दस्तऐवज भाषांतर करून दिले आहेत.
छत्रपती : मेजर बसू? हा हा, म्हंजे ते `राइज ऑफ द क्रिश्चन पॉवर` ग्रंथ लिहणारे तेच ना? ते आपले काम चोख करतीलय म्हणा. पण आपलही काही कर्तव्य आहे का नाही? केवढे प्रचंड कारस्थान हे! यावर कुणीच कसं काय आजवर कुठं लिहिलं नाही ते? महाराष्ट्रात हजारो लेखक कवी नाटककार दरसाल शेकडो ग्रंथ काढतात. त्यांना हा सातारच्या राज्यक्रांतीचा इतिहास लिहिण्याची बुद्धी का नाही झाली?
मी : सरकार, ती कशी होणार? सगळे कलम बहाद्दर पडले एका पराचे भट बामण. हा इतिहास प्रकाशात आणून, त्यांनी काय आपल्याच सग्यासोयऱ्यांची अब्रू चव्हाठ्यावर ठेवायची?
महा. : पण तू तर नाहीस ना त्यांच्या परांचा? हे बघ, तुझे इतर विषय ठेव आजपासनं गुंडाळून नि लाग हा सातारचा इतिहास लिहायच्या कामाला.
मी : सरकार, गेली २०-२५ वर्षे मी या प्रकरणाचे जुने कागदपत्र गोळा करीत आहे. मोठमोठे चार रूमाल भरले आहेत, सगळे कागद मोडी लिपीत. त्यांचे फुरसदीने बाळबोधीकरण करीत असतो.
महा. : आता मला या सबबी नकोत. वाटेल तर रजा काढून कोल्हापूरला येऊन रहा नि तेथे ग्रंथ पुरा कर. काय लागेल तो खर्च माझा. पुस्तक दरबारकडून छापून प्रसिद्ध करू. वाटेल तर दे नोकरीचा राजीनामा नि चल कोल्हापूरला.
`दे मावळ्यांना भडकावून`
यावर अनेक महिने आले तसे गेले. महाराजांची गाठ पडली का पहिला सवाल या इतिहासाचा. सन १९२२ साली शिवजयंतीनिमित्त व्याख्यानासाठी साताऱ्याला जात होतो. पुणे स्टेशनवर बंगलोर मेलमध्ये बॅगबेडिंग ठेवून, मी फलाटावर फिरत होतो. इतक्यात एक हुजऱ्या आला नि शाहू महाराजांनी मला बोलावलंय म्हणाला. स्वारी होती पहिल्या नंबरच्या फलाटावर. गाडी अगदी सुटण्याच्या दिमाखात. पोर्टरला सांगितले, "बाबा लगेज बाहेर काढ नि माझी वाट पहात येथेच थांब. गाडी गेली तर पहिल्या फलाटावर ये."
मी आलो नि नमस्कार केला. महाराज : कुठं निघालास?
मी : साताऱ्याला जातोय भाऊराव पाटलाच्या निमंत्रणाने. शिवजयंती उत्सवात व्याख्यान द्यायला. महाराज : अरे, आता कितीदा तुम्ही `सोळाशे सत्ताविसाच्या साली शिवाजी जन्मला` हे पालुपद गात बसणार? माझी आज्ञा आहे तुला. तेथे तो सातारच्या राज्यक्रांतीचा इतिहास इत्थंभूत सांगून, दे त्या सातारच्या मावळ्यांना भडकावून. मी आज्ञा शिरसावंद्य मानली. त्यावेळी महाराज आपल्या सरंजामासह बडोद्याला लग्नाला चालले होते. निघताना मला आणखी म्हणाले - "हे बघ, मी चाललोय बडोद्याला. ५-६ दिवसांनी मुंबईला परत येईन. तिथं येऊन मला भेट."
राजवाड्याच्या पायऱ्यांवर सातारची कहाणी
दुसऱ्या दिवशी मी बंगलोर मेलने सातारा रोडला गेलो. स्वागताला सातारची खूप मंडळी आली होती. उतरलो कै. नारायणराव वाळवेकर सराफांच्या घरी. बामणेतर पार्टी तेव्हा अगदी जोसात होती. जयंती उत्सव तीन दिवस अगदी थाटामाटात साजरा झाला. सत्यशोधक जलसे, पोवाड्यांच्या स्पर्धा, सकाळसंध्याकाळ अगदी धुमाकूळ. माझी तीन व्याख्याने संध्याकाळी राजवाड्यासमोरील विस्तीर्ण पटांगणात दणाणली. व्यासपीठ राजवाड्याच्या थेट पायऱ्यांवर. सगळे पटांगण श्रोत्यांनी भरगच्च फुलारले होते. मला एका टेबलावर उभा केला होता. त्यावेळी आजकालचा बोंबल्या (लाऊडस्पीकर) जन्माला आला नव्हता, पण आमचा आवाजच असा कमावलेला होता की १०० यार्डांवर तो सहज ऐकू जायचा. तशात लोकही समजूतदार असत. सभेत ते पिन्ड्रॉप सायलेन्स ठेवीत असत. तिन्ही दिवस कै. भास्करराव जाधव अध्यक्ष होते. सातारच्या राज्यक्रांतीच्या इतिहासाच्या कहाणीने सारे बामणेतर चवताळून गेले. एक दोन वेळा प्रतिस्पर्ध्यांनी सभेत गोंधळ करण्याचा खटाटोप केला. त्यांना पकडून कुबकण्यासाठी शेदीडशे लोक धावले. पण जाधवराव नि आचरेकर यांनी जातीने जाऊन त्यांना संरक्षण दिले.
भाऊराव पाटोळ्यांनी आपल्या जलशातील वगांचे छापील पुस्तकच काढले होते. त्यात शिक्षणाचे महत्त्व, अडाण्यांना मारवाडी नि सावकार कसे बनवतात नि फसवतात, हिंदू विधवांचे केशवपन हे केवढे क्रौर्य आहे, वगैरे विषयांवरचे वग होते. रात्री रावबहाद्दूरांनी आपल्या गाडीतून दादासाहेबांना जलशाला आणले. इतरही अनेक मोठमोठे नेते हजर होते. जलसा खूपच रंगला. दोनतीन वग पाहिल्यावर दादासाहेब म्हणाले - "अहो, या २-३ वगांत तर मला आक्षेपार्ह काहीच दिसत नाही. समाजसुधारणेला असलेच प्रयोग पाहिजेत. ही खेडूत मंडळी कधी आपल्या नाटकांना येत नाहीत. त्यांचे करमणुकीचे साधन जलसे. त्यातच असले शिक्षण द्यायला हवे." नंतर चालू झाला विधवा केशवपनाचा वग आणि तो इतका रंगला का तेथे आलेल्या शे-दीडशे सातारकर न्हाव्यांनी एकदम उठून शपथा घेतल्या की `उद्यापासून जो न्हावी बायाबापड्यांना शिवेल, तो आपल्या जन्मदात्या आईला हात लावील.`
झाले. जलसा संपला. उत्सवही संपला. आणि केसरीत बातमी झळकली. `सातारच्या सत्यशोधक गुंडांनी व्हाव्यांना धमक्या देऊन विधवा केशवपनाच्या कामावर बहिष्कार घालायला लावले. सातारा शहरात खळबळ उडाली आहे.` त्यावर कै. गोपाळराव देवधरांनी खुलासा प्रसिद्ध केला की, `विधवांच्या हजामती करायला न्हावी पुरुषच कशाला? बायकांनी एकमेकींच्या हजामती कराव्या.`
अखेर शाहू महाराज परतल्याची -
बातमी जाहीर झाली. तसा मी शाहू पॅलेसवर गेलो. तेथे पहातो तो सहळ्याच बडोदेशाही पगड्या. ओळखीचा कोल्हापुऱ्या कुणी दिसेचना. मी चौकशी केली तर म्हणे महाराज आजारी आहेत, साऱ्या गाठीभेटी बंद. बंद तर बंद. आम्ही हिरमुसले आलो परत आमच्या खुराड्यात.
रात्री ८ ची वेळ एक मोटारगाडी जुन्या दादरात इकडून तिकडे सारखी फिरत होती. कोणाला काही विचारीत होती. `माहीत नाही` असे जो तो उत्तर द्यायचा. अखेर माझे एक स्नेही श्री. भास्कर हरि ठाकूर त्यांना भेटले. ते विचारीत होते, `कोदंड कुठे राहतात.` महाराज मला नेहमी याच टोपण नावाने हाक मारायचे हे त्याला माहीत होते. त्यांनी लगेच पत्ता दिला. "मिरांडाच्या चाळीकडे जा आणि ज्या खोलीत भरपूर उजेडाची बत्ती दिसेल तेथे नेमके जा, म्हणजे तुम्हाला कोदंड भेटतील." ते लोक आले नि म्हणाले – "छत्रपती महाराजांनी तुम्हाला लगोलग बोलावले आहे." त्यांच्या गाडीत बसून मी गेलो. लगेच मला वरच्या मजल्यावर नेण्यात आले. पहातो तो सगळ्या हॉलमध्ये निळा मंद प्रकाश. पलंगाभोवती २-३ डॉक्टर बसलेले. महाराजांचा प्रचंड देह पलंगावर पडलेला नि एक हुजऱ्या छातीवर काहीतरी धरून शेकीत होता. मी पलंगावर गेलो नि नमस्कार केला. "काय काय केलंस साताऱ्याला", इतके महाराज म्हणताच डॉक्टर उठले नि म्हणाले, "छे छे महाराज बोलायचं नाही." महाराज - मी बोललो. आता हाच फक्त बोलणार आहे. मी १० मिनिटांत सातारच्या कार्यक्रमाची हकिकत सांगितली. महाराजांना आनंद झाला. महाराज - बरं आता तू हा इतिहास केव्हा लिहिणार? उद्या मी कोल्हापूरला जातोय, तू चल माझ्याबरोबर आणि तिथं बसून लिहिणे कर. मी - उद्या नाही पण लवकरच रजा काढून येतो. महाराज - तू वांड आहेस. छत्रपतीच्या हातावर हात मारून घे पाहू शपथ. महाराजांनी हात माझ्यापुढे केला आणि मी मोठ्याने शपथ घेतली.
लगेच मी निघालो. बडोदेकरांनी मला त्यांच्या गाडीतून दादरला आणून पोहोचविले. रात्री अकराचा सुमार असेल. जेवलो नि झोपी गेलो. सकाळी ६ वाजता सौ. ने मला हलवून जागे केले. अहो उठा. लोक बाहेर काय बोलताहेत ते पहा. शाहू महाराज गेले! बाहेर येऊन चौकशी केली तो बातमी खरीच! तोंडातून एकच उद्गार निघाला – "अरेरे, दीनदुबळ्याच्या भवितव्यावरचा सर्चलाईट विझला!"
शाहिरांची विलक्षण स्मरणशक्ती
सन १९२२ च्या एप्रिलात सातारा येथील शिवजयंती उत्सवातल्या तीन दिवसांच्या तीन जाहीर व्याख्यानांनी मराठ्यादी बहुजन समाजात अपूर्व खळबळ उडाली. त्या व्याख्यानांतील सर्व तपशील नुसता स्मरणात ठेवून, निजाम पाडळीचा सदानंद आणि कडेगावचा तुकाराम या दोन शाहीरांनी सातारच्या राज्यक्रांतीच्या त्या इतिहासावर दोन सणसणीत दांगडी पोवाडे रचले आणि त्यांचे गावोगाव कार्यक्रम करीत त्यांनी केवळ सातारा जिल्ह्याच नव्हे, तर कोल्हापूर, बेळगाव, नगर जिल्ह्यापर्यंत प्रचाराचा धौशा उडवला. हे दोन्ही पोवाडे `शिवछत्रपती` नावाच्या पुण्याच्या अल्पकालीन दैनिकात ७-११-२२ च्या अंकात छापले गेले. ते मी आपल्या `रंगो बापूजी` या ग्रंथात छापलेले आहेत. शहरी पांडित्याच्या काटकोन चौकोनातून त्या काव्यरचनेची किंमत ठरविण्यापेक्षा नुसती व्याख्याने ऐकून, त्यांतला तपशील स्मरणाने पोवाड्यात बिनचूक गुंफण्याचे कौशल्य मात्र वाखाणण्यासारखेच होय.
अच्युतराव कोल्हटकर तळमळले
साताऱ्याची ती माझी तीन व्याख्याने श्रीपतराव शिद्यांच्या `विजयी मराठा` (पुणे) या लोकप्रिय साप्ताहिकात लागोपाठ तीन हप्त्यांनी तीन आठवडे तपशीलवार प्रसिद्ध होताच, उभ्या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजात विचारक्रांतीची लाट तर उसळलीच उसळली, पण कै. अच्युतराव कोल्हटकर मनस्वी तळमळले. त्यावेळी त्यांच्या हातात असलेल्या `टिळक` साप्ताहिकाच्या दि. १७ नि २५ जून १९२२ च्या अंकात त्यांनी ते सर्व व्याख्यान छापून एक संपादकीय स्फुट लिहिले. त्याचा शेवट त्यांनी असा केलेला होता :
"प्रतापसिंह राजा, तुझे राज्य परत देणे हे आमच्या हाती नाही व तुला परत सजीव करणे हेही आम्हास शक्य नाही. परंतु अजूनही तू आम्हास प्रिय, वंद्य व संस्मरणीय आहेस व पाजी बाळाजीपंताने व विश्वासघातकी आप्पासाहेबाने पीडलेल्या तुझ्या आत्म्याबद्दल रोज क्रोधाचा तीव्र श्वास सोडल्याखेरीज एकही महाराष्ट्रीय रहाणार नाही."
यानंतर अच्युतराय जेव्हा जेव्हा मला भेटायचे तेव्हा तेव्हा "काय बाबा, आमच्या रंगो बापूजीचे काय केले?" हा प्रश्न बिनचूक ठरलेला. एकदा तर पुण्याला भेटायला आले, तेव्हा "काढा पाहू काय काय साहित्य आहे तुमच्यापाशी ते. टिळक साप्ताहिकाचे अंकच्या अंक भरून काढतो छापून सारे." असे म्हणताच त्याच्यापुढे कागदपत्रांचे चार भरगच्च रूमाल भी ठेवले. "अरे बापरे, प्रचंडच कार्य आहे हे", म्हणत ते एकेक कागद चोपडी अभ्यासीत होते आणि मधूनमधून डोळे पुसत होते. "हे बघा केशवराव, जीव गहाण टाका, पण हा इतिहास छापल्याशिवाय मरू नका." हे टुमणे दर भेटीत मग ती कोठेही होवो-अच्युतरावांच्या मृत्यूपर्यंत अखंड चालू होते.
छत्रपती शाहू महाराज नि लो. टिळक
महाराष्ट्रातल्या या दोन थोर पुरुषांचे एकमेकांविषयी अंतस्थ ऋणानुबंध काय होते, हा एक अजून न सुटलेला प्रश्न आहे. टिळक ब्राह्मण आणि शाहू महाराज ब्राह्मणेतर मराठे, एवढाच विकल्पी चष्मा चढविणारांना तो सुटणारा नाही, सुटणार नाही नि सुटलेलाही नाही. दोघांनीही आपापल्या आजूबाजूच्या मंडळींना त्याचा कधीही थांगपत्ता लागू दिल्याचे आढळत नाही. तसा यत्न करणाऱ्यांना, शाहू महाराजांनी दिलेली उडवाउडवीची उत्तरे तर हमखास बहुरंगी असायची. पण प्रत्यक्ष अनुभवाच्या दोन घटना आज मी प्रकाशात आणीत आहे, त्यावरून ज्याला जो निष्कर्ष काढायचा असेल तो काढावा.
`तसे पत्र आलेच नव्हते`
चिरोल केस मुंबई हायकोर्टात चालली होती. प्रो. डोंगरे म्हणजे महाराजांच्या समाजकारणी राजकारणी कॉन्फिडेंशल पत्रव्यवहाराचे खास चिटणीस. पत्रांच्या सेफची एक किल्ली त्यांच्याजवळ आणि मास्टर किल्ली महाराजांच्या ताब्यात. चिरोल प्रकरणात दादासाहेब करंदीकर प्रा. डोंगऱ्यांची उलट तपासणी करीत होते. "सर ली वॉर्नर यांचे एक पत्र महाराजांना आलेले होते काय?" या करंदीकरांच्या प्रश्नाला प्रा. डोंगरे यांनी ठाम आत्मविश्वासाने "मुळीच नाही" असा तीनदा जबाब दिला. रास्तच होते ते. कारण ते पत्र त्यांच्या नि महाराजांच्या खास किल्ली कुलुपातच होते. दोघांशिवाय तिसऱ्याला त्याचा थांगपत्ता लागणे बिलकूल अशक्य. आणखी काही उलटसुलट प्रश्न होऊनही जेव्हा प्रो. डोंगरे यांचा "मुळीच नाही" जबाब कायम राहिला तेव्हा करंदीकरांनी नेमके तेच पत्र डोंगऱ्यांच्या हातात ठेवून "हेच ना ते पत्र?" असे ठासून विचारताच, प्रो. डोंगरे यांना कोर्टात घेरीच आली. कां येणार नाही? इतक्या कडक बंदोबस्दातले पत्र टिळकांच्या वकिलाच्या हातात आलेच कसे?
अशी ऑर्डर निघालीच नव्हती
मुंबई सरकारचे सेक्रेटरी अल. रॉबर्टसन यांची तपासणी दादासाहेब घेत होते. "चिरोल प्रकरणात चिरोल साहेबांना सरकारच्या ज्या ज्या खात्यातले कागदपत्र किंवा माहिती हवी असेल, ती गुप्त रीतीने त्यांना पुरविण्यात यावी अशी कॉन्फिडेंशल ऑर्डर तुम्ही काढली होती काय?" या प्रश्नाला "छे छे. असं कसं होईल? सरकार या खटल्याच्या बाबतीत अविच्छिन्न तटस्थ आहे." असा रॉबर्टसनने जोरदार जबाब दिला. घोळून घोळून अनेक आडवे तिडवे सवाल विचारण्यात आले. तरीही त्यांचा "नो नो, नॉट अॅटॉल" कायमच. "ठीक आहे. लंचनंतर आपण पुन्हा भेटू. तोवर आणखी विचार करून ठेवा", असा दादासाहेबांनी इषारा देऊन लंचसाठी कोर्ट उठले.
लंचनंतर झाली पुन्हा तपासणी चालू. "खास तुमच्या सहीची अशी ऑर्डर निघाली होती किंवा नाही, प्रश्न मी आता एकदाच नि अखेरचा विचारतो. होय किंवा नाही, स्पष्ट सांगा." रॉबर्टसनने "नो नो नेव्हर" असा जबाब देताच, करंदीकरांनी ती ऑर्डरच न्यायमूर्तींच्या हातात ठेवली नि त्यांनी रॉबर्टसनला दाखवली. "आहे ना? तुमचीच ती सही आहे ना?" या प्रश्नाला बिचारा काय उत्तर देणार?
ही ऑर्डर (अस्सलबरहुकूम नक्कल होती ती) मुंबई सरकारकडून खास महाराजांच्या ठेवणीसाठी रवाना झालेली होती. वॉर्नरच्या पत्राप्रमाणे तीही महाराजांच्या खास किल्ली कुलुपात होती. मग ती दादासाहेब करदीकरांच्या हाती लागली कशी?
खटल्याचे काम आटोपल्यावर काही दिवसांनी कोल्हापूरला व्याख्यानासाठी गेलो असताना, प्रो. डोंगरे यांना या भानगडीविषयी विचारले. कपाळाला हात लावून ते किंचित वैतागल्यासारखे म्हणाले, "त्यात ब्रह्ममाये एवढे गूढ काही नाही. खुद्द महाराजांनीच ती दोन कॉन्फिडेंशल पत्रे एखाद्या खास दूताबरोबर टिळकांकडे पाठविली. एरवी जाणार कशी ती त्याच्या हातात? महाराज असं काहीतरी परस्पर करतात नि आमच्यासारख्यांना तोंडघशी पाडतात."
लंडनला चिरोल खटल्याचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांनी मुंबईच्या पन्हाळा लॉजमध्ये महाराजांना भेटण्याचा योग आला. माझ्या गाठीभेटीच्या वेळी फक्त महाराज, दिवाणसाहेब आणि मी या त्रयीपेक्षा चवथा कोणी नसायचा, हे ठरलेले. त्या दिवशी महाराज बरेच मनमोकळे बोलत होते नि हास्यविनोदाला पूर आला होता. लहानपणच्या काही गोष्टी सांगून "आम्ही असे गाढव होतो बरे का, कोदंड, (याच नावाने महाराज नेहमी मला संबोधायचे नि हाक मारायचे.) त्यावेळी." येथवर कळी खुललेली, दिसताच, मी त्या दोन पत्रांचा मुद्दा काढला. महाराज एकदम उसाळीने म्हणाले - "मग काय? पत्रे दाबून ठेवून टिळकाला गोत्यात आणावे आम्ही? त्याचा आमचा काय हेवादावा? देशासाठी तो मरतोय नि आम्ही काय, वेदोक्ताचा वैरभाव राजकारणात सुद्धा गाजवावा? वाद जितक्यास तितका असावा, कोदंड."
पुढ्यातला जेवणाचा थाळा दूर लोटला
लो. टिळक मुंबईच्या सरदारगृहात आसन्नमरण असताना, दर तीन तासांनी त्यांच्या प्रकृतीचे मान कळावे म्हणून महाराजांनी पन्हाळा लॉजमधून ट्रंक कॉल करण्यासाठी एका खास इसमाची नेमणूक केली होती. आणि २-३ दिवस आपले बाहेर जाण्याचे सारे बेत रद्द केले होते. सुमारे ११ वाजता महाराज जेवायला बसले होते, तोच टिळकांच्या मृत्यूची बातमी आली. येताच थाळा दूर लोटून महाराज आचवायला उठले आणि "संस्थानातल्या सगळ्या कचेऱ्या ताबडतोब बंद" करण्याचे हुकूम सोडण्याबद्दल दिवाणसाहेबांना खास निरोप गेला. दिवाणसाहेब येताच, महाराज म्हणाले - "मास्तर, मर्दांनी माणूस गेला! आता कोणाशी आपण लढा देणार? त्याच्या मागे सगळा सारा पोरकटांचा बाजार."
तरुणांची संघटना
सन १९२० पासून नोकरी सांभाळून माझे व्याख्यानांचे दौरे मुंबई ते नागपूर आणि कोल्हापूर बेळगावपर्यंत सारखे चालू होते. ठिकठिकाणच्या शेकडो बहुजनसमाजी कार्यकर्त्यांचा नि माझा घनिष्ट ऋणानुबंध जमत गेला. दौऱ्यांपेक्षाही माझ्या पुस्तकांनी परिचयाचे क्षेत्र थेट खेड्यापाड्यांपर्यंत फैलावले.
खुद्द दादरही आपली खेडुती कात आस्ते आस्ते टाकीत चालले होते. सन १९२० ते २२ चा काळ म्हणजे दादरच्या तरुणांच्या जागृतीचा महत्त्वाचा काळ म्हणावा लागेल. सार्वजनिक वाचनालय, समाजसेवेसाठी स्वयंसेवकांच्या संघटना, जाहीर व्याख्याने, सहकारी तत्त्वावर लहानसान दुकाने काढणे; इत्यादी त्यांच्या खटपटी वरचेवर होऊ लागल्या होत्या. माझ्या विविधांगी चळवळीत प्रथमपासूनच बरेचसे तरुण स्वयंस्फूर्तीने सहाय्याला धावून येत असत.
पण सगळ्यांना वरचेवर एकत्र एका ठिकाणी जमून विचारविनिमय आणि आवडत्या विषयांचा स्वाध्याय करण्याचे हक्काचे ठिकाण नसे. अनेकांच्या पाठिंब्याने, मी नवीनच तयार झालेल्या खांडके बिल्डिंग नं. ६ च्या माथामजल्यावर एक ब्लॉक भाड्याने घेतला. त्याकाळी आत्ताच्या रामराज्य युगासारखी जागेची तणतण नसे. कितीतरी नवनवीन चाळी भाडेकरूंची वाट पहात रिकाम्या पडलेल्या असत.
स्वाध्यायाश्रमाची स्थापना
काही तरुणांना पोस्ट ग्रॅज्युएटशिपचा अभ्यास करायचा असे. काही एलेलबीसाठी निवांत स्वाध्याय करण्यासाठी जागेच्या अडचणीत असत. त्यांना या आश्रमात निवारा मिळाला. चहा-दूध-साखरेची व्यवस्था मी करीत असे. ते घरी फक्त जेवायला जायचे. बाकी सारा वेळ स्वाध्यायश्रमात. माझा सर्व ग्रंथसंग्रह तेथे आणला. प्रबोधन कचेरीची व्यवस्था खाते आणि माझ्या लेखनोद्योगाचे तेथेच ठाण मांडले. ग्रंथसंग्रहाचा अभ्यासू तरुणांना चांगलाच उपयोग होऊ लागला. माझ्या लेखनकार्यात संदर्भ-शोधनाची आणि विचार-विनिमयाची त्यांची आस्था वाढीस लागली.
वक्तृत्वशास्त्राच्या शिक्षणाचा वर्ग
समाजसेवेच्या कार्यक्षेत्रात वक्तृत्वाची आवश्यकता मोठी. माझ्या भोवती जमा झालेली सर्वच तरुण मंडळी समाजसेवेच्या महत्त्वाकांक्षेने फुरफुरलेली. त्यांच्यासाठी वक्तृत्व शिक्षणाचा एक वर्ग मी चालू केला. दर रविवारी दुपारी ३.३० वाजता कोणीतरी एखादा विषय घेऊन, त्यावर आश्रमाच्या हॉलमध्ये व्याख्यान द्यायचे. व्याख्यानाच्या छोट्या हस्तपत्रिका वैद्य ब्रदर्सनी तयार केलेल्या लाकडी हॅण्डप्रेसवर छापून, त्या सर्वत्र वाटण्यात येत असत. साप्ताहिक व्याख्यानांच्या या उपक्रमामुळे श्रोत्यांपैकीं बरेच तरुण आश्रमाच्या कार्यात सक्रीय भाग घेण्यासाठी जमा होत गेले. हा तरुण संग्रह जसजसा वाढत गेला, तसतशा तेथे काही स्वतंत्र संस्थाही निघाल्या. त्यांची हकिकत निराळी येईलच.
विद्वान तज्ञांची भाषणे
आश्रमीयांच्या साप्ताहिक व्याख्यानांच्या बरोबरीने, इतर अनेक विषयांतील तज्ञांची व्याख्याने आम्ही वरचेवर घडवून आणीत असू. कलावंत, कवी आणि वाद्यवादनकार यांच्याही कार्यक्रमांना आश्रमाकडून अल्पस्वल्प सत्कार लाभत असे. सुप्रसिद्ध कम्युनिस्ट नेते श्री श्रीपादराव डांगे यांचे `कम्युनिझम` विषयावर पहिले जाहीर व्याख्यान स्वाध्यायश्रमात झाले. कै. गो. मा. चिपळूणकर, प्रिं. गोविंद चिमणाजी भाटे, प्रो. गोविंदराव टिपणीस, नागपूरचे प्रा. नाना बेहरे इत्यादी अनेक विद्वानांच्या व्याख्यानांबरोबरच, औरंगाबादचे कवी श्री. पद्माकर यांचे काव्यगायन, परलोकविद्या-विशारद श्री. ऋषि यांचे प्लॅंचेटचे सप्रयोग व्याख्यान, एका हत्यारावर तंबोरा, सतार आणि दिलरूबा वाजविणाऱ्या हत्याराचे संशोधक श्री. टुमणे यांच्या त्या वाद्यवादनाचा कार्यक्रम, असे कितीतरी (आत्ताच्या लौकिक भाषेत सांगायचे तर) `सांस्कृतिक कार्यक्रम` स्वाध्यायाश्रमाने साजरे केले. श्री. ऋषिंच्या प्लॅंचेट कार्यक्रमाला तर तुडुंब (प्रचंड शब्दाची किंमत आता शून्य झाल्यामुळे हा शब्द वापरीत आहे.) गर्दी जमली. एरवी आठवड्याच्या कार्यक्रमाला २०-२५ माणसे जमली की आमच्या डोक्यावरून पूर जायचा. पण यावेळी खांडके बिल्डिंगचा माथा मजला श्रोत्यांनी भरगच्च भरला होता. श्री ऋषिंचा परिचय करून देताना, आश्रमाचे एक नेते श्री. भार्गवराव वामन कोर्लेकर म्हणाले - "आजवरच्या येथील जित्या माणसांच्या भाषणांना जेमतेम २०-२५ मंडळी जमायची. पण आज मेलेल्या माणसांशी बातचीत करायला भलतीच गर्दी जमलेली आहे. यावरून जित्यापेक्षा मेलेल्या माणसांचा लळा लोकांना बराच आहे. हे दिसून येते."
थोरथोर मंडळींच्या आश्रमास भेटी नि पाठिंबा
आगरकरांच्या `सुधारका`नंतर सामाजिक सुधारणांच्या प्रश्नाला वाहिलेले `प्रबोधन` हेच एकमेव पाक्षिक असल्यामुळे, महाराष्ट्रातील अनेक समाज-सुधारणाधुरिणांचा त्याला पाठिंबा मिळत गेला. प्रिं. भाटे, प्रो. टिपणीस, गो. मा. चिपळूणकर, सोशल सर्विस लीगचे गोपाळराव देवधर, नागपूरचे नाना बेहरे, सातारचे भाऊराव पाटील, खामगावचे तात्यासाहेब कोल्हटकर, कोल्हापूरचे प्रो. डोंगरे, अण्णासाहेब लठ्ठे, भास्करराव जाधव, विठ्ठल गणेश प्रधान (कराची) किती नावे सांगणार? यांपैकी अनेकांचे लेख प्रबोधनमध्ये येत असत. ग्रंथपरीक्षणाच्या कामीही त्यांची हुकमी मदत मला होत असे. गोपाळराव चिपळूणकर (पुणे) हे तर महिना दोन महिन्यांनी एकदोन दिवसांच्या मुक्कामासाठी आश्रमातच उतरायचे. ते आले म्हणजे अमेरिकेतल्या नानाविध हकिकतींच्या कथा आश्रमीयांना सांगत सुटले का तासन् तास निघून जायचे. प्रबोधनाच्या पहिल्या अंकात "विसाव्या शतकांतील सामाजिक व धार्मिक सुधारकांची कर्तव्ये" या चिपळूणकरांच्या लेखाने अनेक तरुणांना समाजसेवेच्या कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात उतरण्याची स्फूर्ती मिळाली नि ते स्वाध्यायाश्रमाच्या संघटनेत सामील होत गेले. भाऊराव पाटलांचा खाक्या तर औरच. त्यांचा मुक्काम बहुतेक महिना पंधरवड्याचा असे. भावी कार्याविषयीचे सारे प्राथमिक बातबेत त्यांनी आश्रमातच विचार-विनिमयांचे भुसकट पाडून निश्चित केले होते. पण हे आतां भाऊरावच्या सध्याच्या शागीर्दांना कोण सांगणार?
प्रबोधनाचे ध्येय
दि. १६ ऑक्टोबर १९२१ ला निघालेल्या प्रबोधनाच्या पहिल्याच अंकात `प्रबोधनाचे ध्येय` जाहीर करताना माझे विचार काय होते, याचा एकच तुकडा येथे मुद्दाम देत आहे -
"...आजचा प्रसंग असा बिकट आहे की हिंदूना साऱ्या जगाशी तोंड देऊन जगावयाचे आहे. आजची घटका अशी आहे की हिंदूंच्या संस्कृतीची मान साऱ्या जगाच्या राजकारणाच्या चापात सापडलेली आहे. चालू घडीचा मामला असा आहे की सर्व भेदभावांचा सफाई संन्यास करून हिंदुजनांना निरलस भ्रातृभावाने आलेल्या व येणाऱ्या परिस्थितीशी तोंड देऊन आपले हिंदुत्व, आपले आत्मराज्य कायम ठेवून, हिंदू साम्राज्याच्या विशाल आकांक्षांनी हिंदी राष्ट्राचे विराट हृदय चबचबीत भिजवून सोडले पाहिजे."
ब्राह्मणांना आचकट विचकट शिव्या देणारे वृत्तपत्र म्हणून प्रबोधनाला क्षुद्र ठरविण्याचा खटाटोप करणाऱ्या क्षुद्रांना मला एवढेच सांगावेसे वाटते की प्रबोधनातले सर्व अग्रलेख प्राचार्य कृ. पां. कुलकर्णी या महापंडिताने अभ्यासून, प्रत्येक लेखावर आपल्या गुणग्राही संमतीचे उत्कृष्ट शेरे मारलेले बाड माझ्या संग्रही जपून ठेवलेले आहे. गोविंदाग्रज मंडळाने प्रसिद्ध केलेल्या `स्वाध्यायसंदेश` ग्रंथात प्रबोधन पाक्षिकातले आणि इतर अनेक वृत्तपत्रांतले माझे लेख एकत्र छापलेले आहेत. हे पुस्तक अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासून शाळांतील व्याख्यानांच्या चढाओढीत पारितोषिके पटकावलेली आहेत.
पत्र परिचयाने जोडलेले स्नेही
प्रत्यक्षाप्रत्यक्ष परिचयाबरोबर पत्रव्यवहार साहजिकच वाढला जातो. माझ्या पत्र-मित्रांची संख्या विलक्षण वाढली आणि त्यांचे अनेक कार्यांत वेळोवेळी मला फार सहाय्य होत गेले. अशांपैकी कलकत्त्याच्या `मॉडर्न रिव्यू` या इंग्रजी मासिकाचे संपादक कै. श्री. रामानंद चतर्जी यांचा नि माझा पत्रव्यवहारी ऋणानुबंध पिता-पुत्रवत. त्यांच्या खास शिफारशीमुळेच अलाहाबादचे नामांकित इतिहास-संशोधक मेजर बी. डी. बसू यांच्या निकट स्नेहाचे भाग्य मला लाभले.
त्यावेळी मेजर बसू यांचा `स्टोरी ऑफ सातारा` हा सातारच्या राज्यक्रांतीविषयक इंग्रेजी ग्रंथ छापायला घेतला होता. "या विषयावर तुम्हाला खास पडदणीतील माहिती दादरचे प्रबोधनकार ठाकरे अगत्य देतील. त्यांना जाऊन भेटा." असे रामानंदजींनी सुचविल्याचे त्यांचे मला पत्र आले. मेजर बसू प्रथम सातारा येथे पारसनीसांच्या इतिहास संग्रहाकडे गेले. तेथील साहित्य अभ्यासल्यावर त्यांनी त्यांच्याजवळ माझी चौकशी केली. "हो हो, ठाकऱ्यांना अगत्य भेटा" असा पारसनीसांचा निर्वाळा दिला. "पुना मेलने बोरीबंदरवर येत आहे भेटा", अशी बसूची तार आली. आम्ही दोघे तिघेजण व्हीटीवर गेलो. गाडीतून एक शुभ्र दाढीधारी बंगाल्यासारखा गृहस्थ दिसताच, आम्ही जवळ गेलो. आपल्याला कुठं जायचं आहे? विचारता "दादरला" असे उत्तर आले.
मी : दादरला कोणाकडे जाणार आपण?
बसू : मिस्टर थॅकरे दि जर्नालिस्ट.
मी : आयाम ही, सर. कमॉलॉंग.
आम्ही ट्रेननेच दादरला आलो. बसूंच्या सरबराईची व्यवस्था आश्रमीय तरुणांनी लावलीच होती. चहापान स्नानादी उरकल्यावर बसूंनी आपल्या पोर्टमेंटोतून `राईज ऑफ द क्रिश्चन पॉवर` ग्रंथाचे व्हाल्यूम्स काढून मला नजर केले. "फक्त दोनच सेट आणले होते. एक मिस्टर पारसनीसांसाठी नि हा तुमच्यासाठी."
माझ्याजवळची साताराविषयक सर्व कागदपत्रे तात्काळ जुजबी भाषांतर करून त्यांना दाखविली. रात्रभर तो उद्योग चालला होता. अखेर बसू म्हणाले, "छे छे मी फार आधी यायला पाहिजे होते तुमच्याकडे. पण आता काय करणार? माझा ग्रंथ तर बहुतेक छापून तयार आहे. हे बहुमोल साहित्य अधून मधून आता कसे कोंबणार? असं करतो. मी आपला ग्रंथ बाहेर काढतो. तुम्ही मराठीत लिहिणारच आहात. दोघांच्याही ग्रंथांनी या विषयाची पूर्तता होईल." माझ्या संग्रही जी साताराविषयक इंग्रेजी पुस्तके होती, ती मी त्यांना दिली. त्यातला बराचसा मजकूर त्यांनी सातारा स्टोरीच्या पुरवणीत छापला. थोड्याच दिवसांत मेजर बसूंचा `स्टोरी ऑफ सातारा` हा इंग्रेजी ग्रंथ (सन १९२२) प्रसिद्ध होऊन, प्रकाशक रामानंद चतर्जी यांच्याकडून मला भेट आला. प्रस्तावनेत मेजर बसूंनी शेवटच्या परिच्छेदात केलेला खुलासा असा आहे :- "Although I have consulted some of the Marathi records, such as the `Maharashtra Kokil` (now defunct), edited by Rao Bahadur D. B. Parasnis of Satara, whose library was of great help to me in preparing this work, I have not referred to any publication in that language in the Bibliography, for the present work is meant. principally for the English-knowing reading public of India. More over, a work similar in scope to the present one is in preparation in Marathi by Mr. Keshab Sitaram Thackeray, the wellknown Journalist of Bombay."
स्वाध्यायाश्रमाची कामगिरी
महत्त्वाकांक्षी, हिंमती आणि उद्योगी तरुणांना कार्याचे केन्द्र लाभल्यामुळे आणि वाजवी उत्तेजनाचा भरपूर पाठिंबा मिळाल्यामुळे, आपापल्या आवडीप्रमाणे समाजसेवेची अनेक कार्ये त्यांनी हाती घेऊन संघटनांचा जोर वाढवला. देशमुख, कोर्लेकर, कद्रेकरादी मंडळींनी गोविंदाग्रज मंडळ स्थापन केले. मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब कोल्हटकर, कार्याध्यक्ष भार्गवराव वामन कोर्लेकर (सध्या उरण येथे) आणि बाबा देशमुख, चिटणीस. या मंडळात बरीच तरुण मंडळी सामील झाली. त्यांनी एका मागून एक असे पाच ग्रंथ प्रसिद्ध केले. (१) गोविंदाग्रजांच्या पाच कविता, (२) कवनगुच्छ, (३) गीतोपायन, (४) स्वाध्याय-संदेश आणि (५) फुलांची ओंजळ (बी कवींची कविता).
प्रबोधन नाईटचे परिसंवाद
प्रबोधन पाक्षिक दर महिन्याच्या १ आणि १६ तारखेला प्रसिद्ध होत असे. तेव्हा महिना अखेरची तारीख आणि १५ तारीख या दोन दिवशी रात्री आश्रमाची सारी मंडळी व्यवस्थापक श्री. सुळे मास्तरांच्या देखरेखीखाली अंकांच्या पॅकिंगसाठी जागरणाला जमा व्हायची. एकीकडे पॅकिंगची कामे चालायची आणि दुसरीकडे अनेक सामाजिक प्रश्नांवर अस्तिनास्ति वादांच्या चर्चा चिकित्सेचा पिट्टा पडायचा. प्रबोधन नाईटला जवळजवळ पार्लमेंटचे रूप नियमित येत गेल्यामुळे, २५-३० मंडळी हमखास बिनचूक हजर असायची. त्या चर्चांतूनच नवनवीन चळवळी हाती घेतल्या जात असत.
आश्रमाने काय केले?
स्वाध्यायाश्रम म्हणजे एखादा क्लब नव्हता. समाजसेवेचे कोणते ना कोणते काम प्रत्येकाला व्यक्तिशः नि संघशः करावेच लागे. म्हणूनच हुंडा-विध्वंसक संघासारखे जबरदस्त दराऱ्याचे कार्य दोन वर्षे यंत्रासारखे सुरळीत चालले. या संग्रहात समाविष्ट झालेली कितीतरी तरुण मंडळी आपापल्या कर्तबगारीने पुढे नावलौकिकाला चढली. अनंतराव चित्रे, मोरोबा दोंदे, डी. व्ही. प्रधान, डॉ. महादेव जयवंत, श्रीकृष्ण गोविंद देशपांडे (रतलाम), के. जी. कर्णिक (दिल्ली), गोपा प्रधान, बाळासाहेब प्रधान, वकील (जळगाव), भाऊराव पाटील (सातारा), उरणचे कोर्लेकर वकील, शंकरराव गुप्ते, बी. एस्सी. किती नावे सांगणार? डॉ. आंबेडकरांच्या सहाय्यकांतली बहुतेक मंडळी स्वाध्यायाश्रमाच्या तालमीतच तयार झालेली होती.
आश्रमामुळे मोरोबा दोंदे सन १९२१ सालापासून माझ्याशी नि माझ्या विविध कार्याशी स्नेहबद्ध झाले होते. हुंडाविध्वंसक चळवळीत ते नेहमी अग्रभागी असत. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात तर आम्ही दोघे पुन्हा निकट ऋणानुबंधी बनलो. प्रत्येकाचा ऋणानुबंध नि नावे सांगत बसलो, तर ते एक पुराणच व्हायचे. केळुसकर मास्तरांना तर विसरताच येणार नाही. त्यांच्यासारखा कडवा समाजसुधारक नि स्वाध्यायमग्न पंडित आज शोधून आढळायचा नाही.
महाराष्ट्रात परप्रांतियांच्या स्वाऱ्या
सध्याच्या रामराज्यात आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यात, या स्वाऱ्यांनी अपरंपार धुडगूस घालून, मऱ्हाठ्यांना मऱ्हाठदेशातच उपरे निर्वासित बनविण्याचा चालविलेला उपक्रम आता विधानसभेतही डोकाऊ लागला आहे. पण त्या प्रश्नाला मी सन १९२२ सालातच प्रबोधनात तोंड फोडले होते. त्यावेळी सरकारी किंवा निमसरकारी खात्यांत आणि देशी परदेशी व्यापारी कंपन्यांत सीनिअर स्टेनो टायपिस्टला द. म. रु. १०० ते १२५ आणि ज्यूनियर स्टेनो टायपिस्टला ६० ते ७५ पगार मिळत असे. पण त्याच सुमाराला अचानक मद्रासी तरुणांच्या झुंडीच्या झुंडी मुंबईला येऊ लागल्या आणि त्यांनी द्याल तो दाम नि पडेल ते काम या खाक्याने पगाराचे ते प्रमाण २५ ते ५० वर आणून ठेवले. अर्थात स्वस्त दरात भरपूर मिळणारे हे परप्रांतीय नोकर टाकून सरकार किंवा कंपन्या मऱ्हाठी नोकरांची पर्वा करणारच कशाला?
या मुद्यावर प्रबोधनात मी दोन सणसणीत लेख लिहिले. मी राहत होतो त्या मिरांडा चाळीत दोन ब्लॉक्स माझे नि आठ मद्राश्यांचे होते. त्या लेखांचा गवगवा झाला. लगेच सारे मद्रासी (दादर माटुंगा विभागातले) एकवटले आणि त्यांनी माझ्यावर पिनल कोड १५३-अ खाली खटला भरण्याचा मनसुबा रचला. लेखांची भाषांतरे भरपूर फी भरून सरकारी ओरिजेंटल ट्रान्सलेटरकडून करून घेतली. मला वरचेवर त्या बातम्या समजतच होत्या. अखेर सॉलिसिटर बलिस्टरांनी निकाल दिला की पुढे जाण्यात अर्थ नाही. लिहिला मजकूर खोटा पाडता येणार नाही. त्यावर दीडदोनशे सह्यांचा एक अर्ज गवर्नरांकडे पाठविण्यात आला. त्यावर पोलीस कमिशनरांचा खास इन्स्पेक्टर चीफ सेक्रेटरीला भेटण्याबद्दल फर्मानी निमंत्रण मला देऊन गेला.
ते तसे, मग तुम्ही का असे?
या सुमारास एक महत्त्वाची घटना घडली होती. सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ श्री. एस. आर. तावडे हे अमेरिकेतून उच्च शिक्षणविषयक डिप्लोमा मिळवून आले होते. त्यांनी मद्रास सरकारकडे नोकरीसाठी अर्ज केला होता. त्यांना उत्तर आले होते की "ज्याअर्थी आपण मुंबई इलाख्यातील रहिवासी आहात, त्याअर्थी तुमचा अर्ज त्या सरकारमार्फत येणे जरूर आहे." तावड्यांकडून मी तो उत्तराचा कागद बरोबर घेतला आणि सेक्रेटरीएटमध्ये चीफ सेक्रेटरीच्या मुलाखतीला गेलो. सवाल जबाब बरेच झाले. अखेर साहेबबहाद्दर वदले, "अहो, तिकडचे लोक इकडे येतात, तर इकडच्या लोकांनी तिकडे जावे. आहे कसली त्यात अडचण? सारा हिंदुस्थान तुम्हाला मोकळा आहे." त्यावर मी उत्तरलो, "साहेब आपले म्हणणे रास्त आहे. तसेही करायला आमची काही हरकत नाही. पण (तावड्यांना आलेले उत्तर पुढे ठेवून) इतर प्रांतातली सरकारे जर अशी उत्तरे देऊ लागली, तर त्यावर उपाय काय तो सांगा, म्हणजे वांधा मिटला."
साहेबबहाद्दूर क्षणभर गोंधळले नि कागदाकडे पहात स्वस्थ बसले. अखेर, त्या उत्तराची एक नक्कल तात्काळ काढवून, अस्सल मला परत दिले आणि म्हणाले, "ठीक आहे. पहातो आम्ही या प्रकरणाकडे." पंधरवड्याने एक गवर्नमेंट ऑर्डर निघाली. त्याची एक प्रत मला आली. त्यात, कोणत्याही खात्यात जागा रिकामी झाल्यास, प्रांतीय उमेदवाराला प्रथम हक्क द्यावा, वगैरे. एवढ्यावरच तक्रारीच्या तोंडाला चिकटपट्टी बसली. असल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरही संभावित मौन पाळण्याचा मराठी वृत्तपत्राचा खाक्या असल्यामुळे, पुढे हा प्रश्न धसाला लागणार कसा? आज तोच प्रश्न जबरदस्त तडाक्याने मऱ्हाठी जनतेपुढे दत्त म्हणून उभा आहे. पाहू या आमचे महाराष्ट्र सरकार आणि मऱ्हाठी म्हणून मिरवणारी वृत्तपत्रे तो कसा काय सोडवणार ते!
हुंडा विध्वंसक संघ
स्वाध्यायश्रमाने हाती घेतलेली ही मोठी चळवळ. हरएक समाजसुधारक चळवळीतल्या म्होरक्यांना नि कार्यकर्त्यांना स्वकियांकडूनच होणाऱ्या कठोर निंदानालस्तीला तोंड द्यावे लागणार, या आपत्तीची खूणगाठ बांधूनच, आश्रमीयांनी संघाचे कार्य शक्य तितके हिरिरीने चालविण्याच्या प्रतिज्ञा घेतल्या. अनेक दिवस नि रात्र चर्चा चिकित्सेचे पीठ पडत होते. इतर वृत्तपत्रांकडून आपल्याला सहानुभूती तर राहोच, पण कसलेही सहाय्य मिळणार नाही. फक्त एकटा प्रबोधन आपल्या पाठीशी हुकमी खडा उभा आहे. प्रबोधनाचे व्यवस्थापक श्री. सुळेमास्तर आणि मार्तण्ड आत्माराम शृंगारपुरे यांनी प्रबोधनाची रु. १ हजाराची रक्कम संघाच्या कार्यासाठी जाहीर केली. शेजारीच रंगो बापूजींचे भाचे (वैद्य बंधूंचे वृद्ध वडील) काका वैद्य यांनी रु. १० रोख दिले. काका वैद्य आगरकरांचे हितचिंतक. त्यांच्या संग्रहीच्या सुधारकाच्या फायल्यांवरून आगरकरांचा निबंधसंग्रह छापला गेला. सर्व तयारी झाली आणि हुंडा विध्वंसक संघाच्या कार्याचा तपशील जाहीर करणाऱ्या हस्तपत्रिका सर्वत्र वाटण्यात आल्या. ठिकठिकाणी चोरून घेतलेल्या हुंड्याच्या बातम्या मिळविण्यासाठी काही हेर नेमण्यात आले. स्वयंसेवकांचे युनिफार्म असे असत. जानव्यासारखा एक चार इंच रूंदीचा काळा पट्ट. त्यावर अँटी-हुंडा लीग आणि हुंडा विध्वंसक संघ अक्षरांचे बदामी बिल्ले. हुंडा घेतल्याची खबर लागताच संघाची नोटीस वर-वधू पित्यांना एक स्वयंसेवक नेऊन देत असे. `घेतलेला हुंडा सहा तासांच्या आत परत करून, तशी संघाची खात्री पटवावी. नाहीतर संघाला कडकडीत विरोध करावा लागेल. तो कसा असेल हे परिणामी अनुभवाला येईलच. नोटीस मिळताच वर-वधू पिते आणि बरोबर एखादा वकील किंवा संभावित कानांवर हात ठेवायला माझ्या भेटीला आश्रमात येत असत. प्रत्येकाला विशेषतः वधुपित्याला "हुंडा मुळीच दिलेला नाही किंवा देणारही नाही, अशी वधूच्या मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगता का?" असा सवाल टाकला का डेप्युटेशन थंडगार पडत असे.
संघाची जिरवण्यासाठी काही श्रीमंत हुंडेबाज युक्त्याप्रयुक्त्या लढविण्यात दंग होते. कायद्याचा काही तरी दंडा दाखविला का संघवाले गप्प बसतील, अशा भ्रमात ते होते. हुंड्याच्या एका लग्नाचे वऱ्हाड तर खास (संघ होता त्याच इमारतीच्या तळमजल्यावर) उतरले. त्यांच्या पाठीशी ठाण्याचे एक जबरदस्त वकील होते. चौकशी केली. मी स्वतः जाऊन सामोपचाराने (संघाने ठरविलेल्या मुंबई ते ठाणे नि अंधेरी) हद्दीबाहेर जाऊन लग्न लावा, असे सांगितले. पण तुम्हाला विचारतो कोण? जा, काय करायचे असेल ते करा. असा उर्मट जबाब मिळाला. "ठीक आहे, महाराज, आताच दाखवितो संघाचा हिसका. पेट्रोल ओतून मांडव जाळून टाकतो. मग काय व्हायचे असेल ते होईल." असे म्हणून मी माडीवरून संघाच्या कचेरीतून पेट्रोलचा डबा मागविला. (वास्तविक तो होता रिकामाच, पण आणणाराने तो असा वाकत वाकत आणला का जणू काय तो भरलेला असावा.) डबा हाती पडताच ओरडलो, "नुसता डबा काय आणलास? काड्याची पेटी आण." तो आणण्यासाठी वर गेला. (ही गफलतही ठरलेलीच होती.) ठाकरे मांडव पेटवताहेत, या वर्दीने बराच समुदाय जमला. "जा, जा, तुमच्या पोलीस बापांना बोलावून आणा. त्यांच्यासमक्ष आग भडकावतो." अशी मी डरकाळी मारताच, दोघे तिघे बाहेर आले. हात जोडून म्हणाले, "आम्ही जातो. पण हा अतिप्रसंग करू नका. दुसऱ्याच्या बिऱ्हाडात आम्ही जानवसा दिलेला आहे. त्यांना कशाला आमच्यापायी त्रास." ही अक्कल आधी का नाही सुचली? चला आत्ताच्या आत्ता आमच्या समोर निघून जा. अवघ्या एक तासाच्या आत ते वऱ्हाड तेथून निघून गेले. खरे म्हटले तर सत्याग्रह शब्द त्यावेळी फारसा चलनी झाला नव्हता तरी आम्ही सर्व संघीय पडेल त्या संकटाला बिनशर्थ तोंड द्यायच्या निर्धाराने फुरफुरलेले होतो. अगदी तुरुंगात जाण्याचीही आम्हा सर्वांची तयारी होती. आमची संख्या ७० ते ८० स्वयंसेवकांची होती आणि तीत सर्व जातीचे तरुण सरसावलेले होते.
बड्या श्रीमंताच्या लग्नात गाढवाची मिरवणूक
एका बड्या श्रीमंताने हुंडा घेतला होता. हेराने नोटांचे नंबरही आणून दिले होते. नोटीस जाताच दोन वकील आणि वधुपिते भेटीला आले. सारे माझ्या दाट परिचयाचेच होते. खूप चर्चा झाली. हा विषय सामोपचाराने बंद पाडता येईल, वगैरे खूप वाचाळ पंचविशी झाली. लग्न गोरज मुहूर्ताचे होते. मला बोलण्यात गुंतवून परस्पर नवरामुलगा लग्नाला नेण्याचा त्यांचा डाव होता. आमचे स्वयंसेवक आश्रमात हजर होते. इतक्यात हेराने बातमी आणली की पोर्च्युगीज चर्चकडून नवरा निघाला. मी त्या वकिलांना तसेच ठेवून एकदम ऑर्डर दिली- "रस्त्यावर शिस्तीने तयार उभे रहा." आम्ही एक गाढव भाड्याने आणले होते. त्याला भरघोस मुंडावळ्या बांधल्या होत्या. पाठीवर झुलीसारख्या दोन बाजूला दोन कार्डबोर्ड पाट्या लावल्या होत्या. त्यावर "५०० रुपये हुंडा... २०० रुपये करणी.... हुंडेबाज गधडा लग्नाला चाललाय." अशी अक्षरे लिहिलेली होती. याशिवाय हुंडा विध्वंसक वचनांची छोटी हस्तपत्रके छापली होती. दोनदोनच्या ओळीने स्वयंसेवक हसाळी तळ्यासमोर उभे राहिले. अग्रभागी आमचे ते शृंगारलेले गाढव. शिवाय मोठमोठ्या कापडी पाट्या स्वयंसेवकांच्या हातांत. इतक्यात बॅण्ड चौघड्याच्या थाटात नवरदेवाची स्वारी येऊन भेटली. पहातो तो अग्रभागी हत्यारबंद पोलिसांची फलटण. मागे काही बड्या अधिकारावरील बडे लोक आणि इतर. एका स्वयंसेवकाने त्या गर्दीत हस्तपत्रिका वाटल्या. काही चौघड्यांच्या गाडीच्या बैलांच्या अंगावर चिकटवल्या. आम्ही सगळ्यांनी टोप्या घातल्या होत्या. मला कल्पना सुचताच, `हॅट्स ऑफ` हुकूम दिला. भराभर साऱ्या स्वयंसेवकांनी आपापल्या टोप्या रस्त्याच्या बाजूला झुगारून दिल्या. आमची गाढवाची वरात अग्रभागी नि मागाहून नवरदेवाच्या मिरवणुकीचे मल्याण, असा थाट रस्त्याने चालू झाला. बघ्यांची गर्दी विलक्षण उसळली. चाळीचाळीतून स्त्रीपुरुष मुले गॅलरीत जमा झाली. आम्ही निःशब्द चालत होतो. लेडी जमशेटजी रोडवर कीर यांच्या वाडीत ते लग्न व्हायचे होते. तेथपर्यंत ५-६ ठिकाणी चाळीतल्या काही भगिनी चक्क रस्त्यावर आल्या नि आम्हाला ओवाळून गेल्या. प्रत्येक चाळीतून तर अक्षतांचा नि फुलांचा आमच्यावर वर्षाव होत होता. हा प्रकार पाहताच लग्नवऱ्हाड्यांची तोंडे पहाण्यासारखी झाली.
महिला तर सारख्या स्फुंदत होत्या. कीर वाडीच्या तोंडाशी आम्ही सारे रांगेने उभे राहिलो. `हुंडेबाजाचा धि:कार असो`, अशा गर्जना चालू केल्या. मिरवणूक मंडपात गेली. त्यांच्यापैकी एक शिष्ठ रागारागाने आला नि म्हणाला, "वाडीत येण्याची शहामत आहे का तुम्हाला?" "आहे की. पहा आलोच पाठोपाठ." संघसेना मी मांडवाच्या दारासमोर नेऊन उभी केली आणि कवी वसंतविहारकृत हुंडानिषेधाची पदे आम्ही गाऊ लागलो. पुन्हा तोच इसम ओरडला – "बाहेरच राहणार उभे? आत येण्याची छाती असेल तर या ना?" हे शब्द ऐकताच मी मंडळींना घेऊन आत मंडपात शिरू लागताच, जज्जच्या हुद्यावर असलेले एक बडे साब डुरकत माझ्यासमोर आले. "आत याल तर याद राखून ठेवा. सगळ्यांना पोलीस चौकीत बसावे लागेल. कायदा आहे का माहीत?" मी "साहेब, कायद्याचा इंगा मलाही दाखवता येईल तुम्हाला. (वधुपित्याला हाक मारून) मिस्टर इकडे या. तुमची निमंत्रणपत्रिका मला आलेली आहे. ही पहा. त्यात `सहकुटुंब सहपरिवार येण्याची कृपा करावी`, असे स्पष्ट छापलेले आहे. मी माझा परिवार घेऊन आत येत असता, हे जज्जसाहेब मला प्रतिबंध करीत आहेत. त्यांना कायदा कोळून पाजा आधी. आम्ही तर येथे आता बसणारच. मागाहून पोलीसचौकी आहेच."
सारेजण घाबरले. जज्जसाहेब तणतणत कोठेतरी आत गेले. आम्ही बाहेरच मग थांबलो. मंगल कार्यात विघात करायचा नाही, असा आमचा नियम. विवाह विधी पार पडेतोवर आम्ही स्वस्थ उभे राहिलो. मंगलाष्टके संपल्यावर वाद्यांचा दणदणाट झाला नि आम्ही वर-वधूला `चिरंजीव यशवंत भव` असा आशीर्वाद गरजलो नि पुन्हा एक हुंडानिषेधक गाणे गाऊन परतलो. त्यानंतर पोर्च्युगीज चर्च ते कीरवाडीपर्यंत आमची गाढवाची मिरवणूक एक तासभर चांगली फिरत होती. त्याचा परिणाम लोकमतावर फार चांगला झाला.
रात्री आठच्या सुमाराला आम्ही आश्रमात परतलो. पहातो तो आम्ही रस्त्यावर फेकलेल्या सर्व टोप्या कोणीतरी उचलून आश्रमात आणून ठेवलेल्या होत्या.
पोलीसपार्टीचे अध्यात्म
हुंड्यासारख्या समाजविध्वंसक रूढीवर हल्ला करण्यासाठी संघाने मिरवलेली गाढवाची मिरवणूक म्हणजे सार्वजनिक शांततेवर गण्डान्तर होते थोडेच? मग त्यासाठी मुंबई सरकारने १६ हत्यारबंद पोलिसांची सेना हुंडेबाज लग्नाच्या मिरवणुकीत धाडली कशाला? चौघड्याच्या गाडीमागे अगदी बिनीला पोलिसांची फलटण पहाताच, प्रत्येक पोलिसाच्या छातीवरील पितळी नंबर टिपून घ्यायचे काम एका स्वयंसेवकाला सांगितले. ते हाती आल्यावर, प्रबोधनात आव्हान देणारे एक स्फुट मी लिहिले. तात्काळ पोलीस खात्याची चक्रे गरगरा फिरू लागली. डेप्युटी कमिशनर मि. कॉटी यांचे मला आमंत्रण आले. माझ्या विधानाचा त्यांनी पुरावा मागितला. मी पोलिसांचे नंबर त्यांना दिले. चौकशीची यंत्रे जोरदार फिरू लागली. सुमारे १५ दिवसांनी पुन्हा मला आमंत्रण आले. भेटलो. भानगड त्रांगड्याची निघाली. त्याकाळच्या ८ पोलीस स्टेशनांत ८ सुपरदंट हापसर आमचे जातभाई होते. एका बड्या जज्जसाहेबांच्या बुरखेबाज सूचनेवरून प्रत्येकाने आपल्या अखत्यारातील २-२ शिपाई मिरवणुकीला पाठविले होते. पार्टी पहाताच संघवाले भेदरतील नि गप्प बसतील किंवा पसारही होतील, अशी योजकांची खुळी कल्पना. पण भलताच प्रसंग ओढवला! आमचे जातभाई हापसरच त्रांगड्यात अडकले. त्यांचे जाबजबाब चालू झाले. कॉटी साहेबाने पडलेल्या पेचाचा सवाल माझ्यापुढे टाकला. संबंधित जातभाई हापसरही माझी काकुळतीने याचना करू लागले. अखेर कॉटीने तोडगा सुचविला. या प्रकरणावर आणखी काही मी न लिहिता, ते तसेच सोडावे. म्हणजे संबंधित हापसरांना दिलेल्या तोंडी जरबेवरच या प्रकरणाची समाप्ती करता येईल. मी कबुली दिली आणि ते पोलीसपार्टी प्रकरणाचे अध्यात्म तेथेच जिरले.
पोलिसांकडे तक्रार-अर्ज
हुंडा-विध्वंसक संघाच्या चळवळीमुळे, कायस्थ प्रभू जमातीतील बऱ्याच शिष्ठमंडळींच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. त्याच वेळी प्रबोधनाच्या दरएक अंकात हुंडेबाज शायलॉकांची यादी मी नावनिशीवार, हुंड्याच्या नि देण्याघेण्याच्या आकड्यासह छापण्याची सुरवात केली होती. गाढवाच्या मिरवणुकीतून निसटले, तरी या यादीच्या तडाक्यातून कोणीच सुटत नसे. एक नमुना पहा : "हुंडेमान्य हुंडेश्री (संपूर्ण नाव) बी. ए. कोणाच्याश्या कॉलेजात (ब)फेलो. रावसाहेब..... यांनी रु. २१०० ला विकत घेतला." गावोगावांहून हुंडेबाजांच्या याद्या येत होत्या नि त्या छापल्या जात होत्या. काहीही करून ठाकरेला एखाद्या खटल्यात अडकविलाच पाहिजे, अशा सु-शिक्षित धोरणाने दादरमाटुंगा लत्त्याच्या सुमारे शेदीडशे कायस्थ प्रभूंच्या सह्यांचा "ठाकरे बदनामीकारक हस्तपत्रिका वाटतात, सभांतून प्रतिष्ठित मंडळींची इभ्रत घेतात, सबब पोलीस कमिशनर साहेबांनी त्यांच्या चळवळीचा बंदोबस्त करावा", अशा अर्थाचा तक्रार अर्ज केला.
हे गुपचीप प्रकरण साहजिकच मला कळणे शक्य नव्हते. अर्जावर नुसत्या सह्याच होत्या. पत्ता असा कोणताच नव्हता. तेव्हा पहिली सही करणाराच्या नावाने नुसता दादर एवढ्याच पत्त्यावर पोच कार्ड आले. पोस्टमनने ते द्यायचे कुठे नि कोणाला? ते त्याने प्रबोधनाच्या दैनिक टपालाच्या बंडलात घुसडले नि माझ्या हाती लागले. (अजून ते माझ्या संग्रही जपून ठेवले आहे.) कोण हा आर. जी. देशपांडे, असावा? याची स्वयंसेवकांनी गुप्त चौकशी करून, नक्की पत्ता काढला. "संघाचा युनिफॉर्म चढवून जा त्याला हे पोचकार्ड नेऊन दे", असे मी एका स्वयंसेवकाला सांगितले. त्या गृहस्थासमोर स्वयंसेवक कार्डासह उभा रहाताच, त्याने नांगीच टाकली. "छे छे, नाव माझ्यासारखे असले तरी तो मी नव्हे, मला काय करायच्या या भानगडी", वगैरे सांगून पत्र घेण्यास नकार दिला.
एक दिवस पहातो तो डे. कमि. कॉटींचे आमंत्रण. त्यांनी त्या अर्जाची हकिकत सांगितली. पोच कार्ड दाखवून "आहे मला माहिती" असे मी सांगितले. तेव्हा स्मिथ सुपरिटेंडेंटला जाऊन भेटा, असे तो म्हणाला. स्मिथने तो अर्ज नि त्यावरील कॉटीचा शेरा मला दाखविला. तो शेरा असा - "Mr. Thackeray is rendering yeoman service to the cause of Hindu Social Reformation. If the applicants persist in reminding, put up the papers for hauling one or two applicants for prosecution under Chapter." परत येऊन मी कॉटीचे आभार मानले. तो म्हणाला - कायद्याच्या कक्षेत शांतपणाने चळवळ चालवा, मी लागेल ती मदत देईन.
हुंडानिषेधक मिरवणूक असते तरी कशी?
बहुतेक दररोज माहीमचा एक पोलीस सब इन्स्पेक्टर "उद्या कोणीकडे तुमची मोहीम?" अशी चौकशी करून जात असे. एक दिवस सकाळी १० वाजता संघाची स्वारी माटुंग्याला एका हुंडेबाज लग्नावर जायची होती. हुंडानिषेधक गाणी म्हणत आमची फलटण, बिब्बी नि ज्यापी रेल्वेच्या वैतरणा (लेव्हल क्रॉसिंग्ज) ओलांडून, दादर मार्केटच्या चौकात आली. पहातो तो खुद्द कॉटी साहेब आणि मुफ्ती पोलीस नाक्यावर हजर. काही पोलीस फोटोग्राफर एका बैठ्या इमारतीच्या छपरावर चढून संघसैन्याचा फोटो घेत होते. कॉटीने मला बोलावले आणि थोड्या लांबवर दूर नेले. संघमिरवणूक आस्ते आस्ते येतच होती. खांद्यावर काळे पट्टे, सगळे बोडके, अशा स्वयंसेवकांची ती मिरवणूक मला दाखवून कॉटी म्हणाला, "व्हॉट ऐ टेरीबल थ्रेटनिंग धिस मेक्स? तुम्ही तुमची मिरवणूक पाहिली नसेल, पण आता प्रत्यक्ष पहा." हो. मी स्वतः कसा ती पाहू शकणार? पण देखावा मात्र जबरदस्त दराऱ्याचा दिसला खरा.
सन १९२२ सालच्या लग्नसराईत संघ या ना त्या हुंडेबाज लग्नावर गाढवाच्या मिरवणुकांचा हल्ला करायला टिपला जात असे. त्यामुळे बरीचशी तसली लग्ने ठाणे अंधेरी हद्दीबाहेर होऊ लागली. खुद्द ठाण्याला मात्र आम्ही जरी गेलो नाही, तरी एक दिवस हुंडा विध्वंसक संघ ठाण्याला येणार या अफवेनेच रस्त्यावर लोकांची झुंबड उडाल्याची बातमी आली होती. संघाच्या कार्यामुळे, एक भलताच अनुभव आला. हसाळी तलावाजवळ काम करीत असलेल्या गाढवटोळीच्या वेलदारांचा भाव वधारला. पहिल्या दिवशी गाढवाचे भाडे ६ आणे दिले. तो भाव वाढता वाढता २ ते ५ रुपयांवर आला. अडला संघनारायण गाढवाचे पाय धरी, या म्हणीचा प्रत्यक्ष अनुभव आला म्हणाना. अंधेरीच्या एका दर्भश्रीमंताच्या भावाच्या शायलाकी लग्नावर मोर्चा न्यायचा होता, तेव्हा तर वेलदाराने चक्क रु. १० ची मागणी केली. तसे म्हटले तर दहा रुपयाला एक गाढव सहज विकत घेता आले असते. पण हुंडेबाज गधड्यांची जिरवण्यासाठी आम्ही तोही भाव दिला.
१९२२-२३ सालात लग्नसराईच्या हंगामात आम्ही अंदाजे २०-२५ हुंडेबाजांच्या लग्नमंडपांवर स्वाऱ्या केल्या असतील. त्याचप्रमाणे बिनहुंड्याच्या काही विवाह प्रसंगी संघसेना टोप्या घालून अभिनंदनाची गाणी गात मंडपात जायची आणि वर वधूला हार घालून परत यायची. सन १९२३ च्या सप्टेंबरात भाऊराव पाटलाच्या आग्रहाला बळी पडून मी सातारा रोडला गेलो. साहजिकच माझ्या मागे स्वाध्यायाश्रम आणि त्याच्या छपराखाली बळावलेल्या सगळ्या चळवळी बंद पडल्या.
प्रकरण १३
माझे सिनेक्षेत्रातले विविध अनुभव
मऱ्हाठी रंगभूमीच्या क्षेत्राचा पुरेपूर अनुभव घेण्याचा योग परिस्थितीने माझ्या पदरी घातला होता. पण सिनेक्षेत्राच्या सैतानी भानगडीच्या वेढ्यात कधीकाळी मी अलगद झुगारला जाईन, ही मात्र मला कल्पना नव्हती. व्यापारी कंपनीत इंग्रेजी पत्रव्यवहारतज्ञ म्हणून काम करीत असतानाच एका पत्राच्या मसुद्यावरून सुप्रसिद्ध सिनेव्यवसायी श्री. जमशेटजी वाडियाशेटजीच्या मी नजरेत भरलो आणि त्यांनी वाडिया मूविटोन संस्थेत चीफ पब्लिसिटी ऑफिसर म्हणून मला मागवून घेतले.
मग हो काय? मराठी नि इंग्रजी बोलघेवड्या जाहिराती, सिनेकलावंत, चित्रवितरक कंपन्या ब्लॉकमेकर्स, सिनेजाहिरातीसाठी लांगूलचालन करणाऱ्या खास सिनेसृष्टीला पाहिलेल्या संगीत रंगीत वृत्तपत्रांचे जाहिरातशिकारी यांचा माझ्याभोवती पन्हाळी गराडा पडला. स्टुडियोच्या प्रांगणात तर काय? शुटिंगची रात्रंदिवस धांदल चाललेली. हरएक तऱ्हेचे कारागीर सारखे खपताहेत. प्रांगणात मोठमोठी शहरे, उद्याने, तलाव, रेल्वेचे पूल भराभर तयार होत आहेत आणि ५-६ दिवसांत अचानक नाहीसे होऊन, त्याजागी दुसरेच देखावे नजरेला पडताहेत. अशा निराळ्याच मयसृष्टीत मी तन्मय झालो.
कथानकाची मागणी
याच सुमाराला कोटातल्या कॅपिटॉल थेटरात वाडियांचा एक बोलपट लागणार होता. त्याची व्यवस्था पहाण्यासाठी सहज गेलो असता, सिनेदिग्दर्शक श्री कुमारसेन समर्थ यांनी मला अचानक गाठले `द्रौपदी` विषयावर तुम्ही एक सिने कथानक लिहून द्यावे. अशी त्यांनी मागणी केली आणि लगेच मला क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये माझी वाट पहात असलेल्या श्री. बाबूराव पेंढारकरांकडे ते घेऊन गेले. हरहुन्नरी माणसाने संधी येताच आपल्या हुन्नराची अगत्य कसोशी लावावी, हा माझ्या अखंड झगड्यांच्या जीवनाचा गाभा.
द्रौपदीविषयक महाभारतीय साहित्याचा आठवडाभर कस्सून अभ्यास केला. सुमारे महिनाभर मी समर्थ आणि बाबूराव पेंढारकर तिघेजण बोलपटाच्या प्रत्येक क्रमांकावर चर्चा चिकित्सा करून, एकेक देखावा, संवाद, मोंटाज इत्यादी शेकडो टेक्निकल मुद्दे ठरवीत गेलो. बोलपट टायपून तयार झाला. त्यांची कलावंतांची निवड वगैरे निश्चित झाली. सेंट्रल स्टुडियोत शुटिंग होणार. एक दिवस संबंधित सगळ्या नट नट्यांच्या बैठकीत, प्रत्येकाला आपापली भूमिका समजावून देण्याचा कार्यक्रम मला साजरा करावा लागला. बाबूरावांसाठी शकुनी मामाची भूमिका आम्ही खास रेखाटली होती.
अचानक फाटाफूट झाली!
झाले. एक दिवस सेण्ट्रलमध्ये द्रोपदी बोलपटाचा मुहूर्त साजरा झाला. श्री. बाबूराव पटेलांच्या फिल्मिडिया मासिकात भव्य जाहिरात फडकली. कथानक संवाद-लेखक म्हणून अस्मादिकांचे नाव जेहत्ते छापून जगजाहीर झाले. मुहूर्ताच्या दिवशी पहिला प्रचंड देखावा यथासांग `टेक` करण्यात आला. २-४ दिवसांतच पेंढारकर आणि पटेल यांच्यात कुरबूर चालू झाल्याचे कर्णपथावर आले आणि लगेच बातमी फुटली की पेंढारकर बाहेर पडले. पाठोपाठ कुमारसेन समर्थ द्रोपदी बोलपटाचे नियुक्त दिग्दर्शक हेही पाटलोणीच्या खिशात दोन हात अडकवून हास्याचा खोकाट करीत बाहेर निसटले, ही निसटानिसटी नि बाचाबाची का झाली, का व्हावी, हेच मला उमगेना! का, यातही काही सिनेट क्निक असते? त्या बोलपटाची हरीण (हिराईण) कोण? यावर मतभेद झाला. पेंढारकर म्हणत की शांता आपटे किंवा शोभना समर्थला घ्यावी, तर बाबूराव पटेल यांची सुशीला राणीबद्दल जोरदार तरफदारी.
अखेर सारीच फाटाफूट झाली. पटेलांनी पट-वर्धनाचे कार्य खास आपल्या हाती घेतले. सारे कथानक आरपार बदलले. सगळेच नवीन तयार केले. त्यांनी ही घटना मला फोनवर कळविली. "असं आहे तर मग माझे नाव जाहिरातीत विनाकारण कशाला?" त्यांनी त्या जागी सुशीला राणीचे नाव घातले, माझा औट घटकेचा संबंध सुटला. पण पटेलांनी मात्र माझा ठरलेला मेहनताना घरपोच रवाना केला.
पुन्हा मोह पडला
ही झाली आमच्या सिनेक्षेत्रातील पहिल्या व्यापाराची भवानी. पैसे मिळाले हो, पण केलेली सारी २-३ महिन्यांची तपश्चर्या हवेत विरली. हे सिनेमाचे लोक नेहमी टीम वर्कची मिजास मारीत असतात, पण हे क्षेत्रच असे सैतानी आहे की तेथे टीमची स्टीम भडकून बट्ट्याबोळ उडेल याची शाश्वती ब्रह्मदेवालाही देता येणार नाही. सारांश दिसते तसे नसते, म्हणून माणूस फसते, ही म्हण या क्षेत्राला अगदी फिट्ट लागू पडते.
थोड्याच दिवसांनी आलाच तो मोहाचा पगडा. पण या खेपेला तो `शिणेद्येवाच्या कुरपेनं` यथास्थित तडीला गेला. वाडियात माझ्या जागेवर पूर्वी असलेले कै. छोटुमाई यांनी मला `नल-दमयंती` आख्यानावर एक कथानक संवादांसह लिहिण्याचा आग्रह केला. सर्व काही पसंत पडून, शुटिंगला सुरवात झाली. नलाथी भूमिका पृथ्वीराज कपूरकडे नि दमयंतीची भूमिका शोभना समर्थकडे. सगळे काही यथास्थित चाललं असताना, दिग्दर्शक म्हणून नेमलेल्या महाशयाने एका नटीशी लव्हाळ्याचा अतिप्रसंग केला. झाले. वातावरण तापले. दिग्दर्शक पळाले. आता? छोटूभाईनी लगेच कुमारसेन समर्थांना बोलावून, पटाचे चित्रण संपूर्ण केले. बोलपट मुंबईत नि बाहेरगावी चांगलाच गाजला. अस्मादिकाला दक्षिणाही भरपूर मिळाली.
`महानंदा` सती गेली
या क्षेत्रात किंचित का प्रवेश मिळेना, जुगार किंवा शब्दकोड्याच्या मोहासारखा मोह माणसाला होतो. शब्दकोड्यात एकदा बक्षिस मिळाले, का माणूस चटावतो नि अखेर नारळरावाची मातोश्री हातात घेतो. माझीही पुढे अशीच फसगत झाली. झाली, म्हणण्या पेक्षा मीच अडकत गेलो. सिने-मोह जबरदस्त असतो.
नल-दमयंती गाजल्यामुळे, या क्षेत्रातले देखाव्यांचे साहित्य पुरविणारे एक कंत्राटदार गृहस्थ `महानंदा` बोलपटासाठी मला येऊन चिकटले. राजा बढे यांच्याकडे गीतरचनेचे काम. दिग्दर्शक समर्थ. सुरुवातीला सर्व काही ठाकठीक जगत गेले. सर्व गीतांचे रेकॉर्डही झाले. आता शूटिंगला सुरुवात होणार, तोच त्या कंत्राटदाराचे पाय भांडवलदारीच्या निसरडयावर घसरत असल्याचे कळले. अखेर काय? तर एवढे सारे होऊनही अखेर ओंफस महानंदा भांडवलाच्या सरणावर सती गेली आणि तिची गाणी ग्रामोफोन कंपनीच्या काढत जिवंत राहिली. मी नि राजा बढे यांच्या पदरात अर्धामुर्धा मेहनताना कसाबसा पडला चोरांची लगोदी म्हणतात ना, तशातली गत.
तमाशावरच्या बोलपटाचा तमाशा
माझे शेजारी श्री कृष्णराव खटावकर (टेलर्स औटफिटर्स) एक दिवस भेटले नि तमाशा विषयावर बोलपट लिहून द्या म्हणू लागले. त्यांची त्यावेळी व्यापार व्यवहारात मनस्वी ओढगस्त झालेली होती आणि या नव्या व्यवसायात धडपड करून काही साधने का पहावे, हा त्याचा मनोदय केवळ एका शेजारी स्नेह्याला अप्रत्यक्ष सहाय्य, एवढ्याच हेतूने मी होकार दिला. भांडवल्या नि डिस-ट्रीब्युटरादी सर्व व्यवस्था लागल्याचे त्यांनी सांगितले. दिग्दर्शक म्हणून एक कोल्हापुरी घाटाचा लडधूही माझ्यासमोर आणून उभा केला. मी काम चालू केले. रोजच्या रोज तयार होणारा मजकूर तो लडधू घेऊन जात असे. अचानक बातमी फुटली की खटावकराचे नि त्या डिरेक्टर लघूचे फाटले. पटातील गाणी कवि राजा बढे यांनी तयार केली. एक दिवस आम्हाला पहिले काही शूटिंग झाले ते दाखवायला आगर बारातील स्टुडियोत नेले, पहातो तो स्वतः हे लघू महाराजच हिरोच्या भूमिकेत! मी तक्रार केली. कारण सर्व भूमिकांची पात्रे माझ्या सल्ल्याने ठरविण्याची अट मोडली गेली.
या सगळ्या भानगडी होत असतानाच बोलपटाचे भांडवल्ये एकदोनदा मला येऊन भेटले. ते त्रांगडेबाज पात्र पहाताच बोलपटाचे थालीपीठ होणार हे भाकीत सहज करता आले. मी माझा सहकार बंद केला. पण तो लघू हिरो शहामतीचा त्याने इंटरव्हलपर्यंत हातात पडलेल्या तपशिलावरच `कलगी तुरा` बोलपट दिला फडकावून सगळीकडे. त्याचा अर्थात बोऱ्या वाजला. त्यानंतर मात्र जे जे बोलपटवाले माझ्याकडे आले, त्यांना मी जवळजवळ हुसकावून दिले आणि पुन्हा या क्षेत्रात कथा-संवाद-लेखक म्हणून पाय न ठेवण्याची शपथ घेतली. मात्र २-३ प्रसंगी आचार्य अत्रे यांच्या माझी लक्ष्मी, शामची आई आणि महात्मा फुले बोलपटांत तोंडाला सफेदा फासून काही भूमिका केल्या त्याबद्दल कवडीही मिळाली नाही आणि तशी मुळात अपेक्षाही ठेवलेली नव्हती. केवळ षोक म्हणून ती कामे केली.
प्रबोधन आणि `वसंतविहार` कवि
प्रबोधनाचा जन्म झाल्यापासून अगदी पहिल्या अंकापासून कवि वसंतविहार ऊर्फ जोशीबुवा यांचा जिव्हाळ्याचा सहकार लाभला. ज्यात वसंतविहारची समाजहितवादी कविता नाही, असा एकही अंक निघाला नाही. बिचारा कमालीचा प्रसिद्धिविन्मुख अत्यंत विनयशाली, मितभाषी वसंतविहाराचा कवितासंग्रह फार मोठा आहे. वीर सावरकरांच्या अध्यक्षतेखाली मुंबईला भरलेल्या साहित्य परिषदेच्या काव्यगायन समारंभात त्यांच्या दोनच कवितांचे श्रोत्यांनी वन्समोरने कौतुक केले होते. हा कवितासंग्रह कै. कवि सुळे प्रभूती स्नेहीमंडळींनी खटपट केली होती. जोशी अल्पवयातच मृत्यू पावले. मागे त्यांची फक्त एक विवाहबध्द कन्या पुण्याला कोठेतरी रहात आहे. हा कवितासंग्रह छापण्याची कै. य. गो. जोशी यांनी छापावा. आणि रॉयल्टीचे ठरेल ते धन त्या कन्येला द्यावे म्हणून मी बराच पत्रव्यवहारही केला होता. पण दाद लागली नाही.
वसंतविहारांच्या सर्व कविता प्रबोधनाच्या ध्येय धोरणांना अनुसरूनच असत. त्यांतील एकच कविता नमुन्यासाठी येथे देत आहे. शितावरून भाताची परीक्षा रसिक वाचकांना तेव्हाच करता येईल. आम्ही कोण या विषयावर अनेकांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. पण वसंतविहाराची त्याच मथळ्याची ही कविता पहा.
आम्ही कोण?
जुन्या पुराण्या चिंध्या माथा
मनुस्मृतीचा मुखांत गाथा
कर्मठतेच्या चिपळ्या हाती
अंधश्रद्धा अंगिं विभूति
या समयाला धक्का त्यांला
देऊनि पुढती सरणारे १
जुन्या नव्याचें मिश्रण साचें
कोरिव लेणें स्वयंत्रभेचे
पुतळे आम्ही स्वतंत्रतेचे
पाश आम्हाला मग कवणाचे
मतलब सिधुंत शिला सोडुनी
त्यावर आम्ही तरणारे २
गोवळकोंडा खाण आमुची
तेथील रत्ने अनुपमतेची
त्यांवर सत्ता सम सर्वांची
कैलासाहुनि रामेश्वर तें
एक दिलाने फिरणारे ३
इतिहासाच्या पानांवरती
नजर टाकुनि न शांति नुसती
समररंगणी हम रंगानें
एक जुटीने उत्साहानें
वीरश्रीचें कंकण बांधुनि
वैभवगड सर करणारे ४
पाताळीच्या लुटूं बळीला
अस्मानांतील सुलतानाला
जमीन जुमला मृत्युलोकचा
हा तर अमुच्या अधिकाराचा
कर्तव्याच्या समशेरीला
बिजलीवाणि फिरविणारे ५
रडते राऊत व्हा हों मागें
कशास येता अमुच्या संगें?
गोमुखीत घालुनिया हाता
ठोका पोकळ जपांत बाता
भगवा झेंडा ठाऊक आम्हां
आम्ही तो फडकविणारे ६
स्वतंत्रतेचे खेळत वारे
फुटले तुटले फुगे फवारे
जीर्ण मताचे ते डोलारे
धूळ खात सांगाडे सारे
जरिपटका हा ठाऊक आम्हां
आम्ही तो फडकविणारे ७
या समशेरबहाद्दर सारे
हिंददेविधे सुपुत्र सारे
कलाकुशलता दावा आतां
वीरश्री जी तुमच्या हाता
हां हां म्हणतां जिंकू आपण
दुष्मन्दौलत लुटणारे ८
सुमनांचा हा सुंदर झेला
रसिका सादर अर्पण केला
कवीश्वराचा प्रसाद मेला
कवि म्हणवीन कुणाचा चेला
सत्य वसंतविहार गीत हैं
प्रतिलोकांत घुमणारे ९
- प्रबोधन, दि. १-१२-१९२१
वसंतविहाराच्या जोडीनेच कै. विनायकराव बर्वे ऊर्फ कवि आनंद यांचाही स्नेह आणि सहकार प्रबोधनाला अव्वल अखेर लाभला. त्यांच्याही काही उत्कृष्ट कविता प्रबोधनाच्या फायलीत आहेत. मागे `मार्मिक` मध्येही दोन तीन पुनर्मुदित केल्या होत्या. सातारा रोडच्या कूपरशाहीत तळून मळून निघाल्यावर प्रबोधनवर आणि माझ्यावर अनेक संकटांचा हल्ला झाला. प्रबोधन चवथे वर्ष पहातो, का तेथेच गडप होतो, असा प्रसंग होता. पण नेटाचा यत्न करून, पुण्याला छापखाना काढला नि प्रबोधनाच्या पुनरुत्थानाची दौंडी पिटली. तेव्हा कवि आनंदाने अभिनंदन मथळ्याची पाठवलेली नि त्या अंकाच्या पहिल्याच पानावर छापलेली ती कविता पहा
अभिनंदन
ऊठ गड्या हा दिला हात तुज
घे लेखण हाती आज
वाट पहाते नवी धरित्री
चढव तुझा लेखनसाज १
उन्मत्तांनी निशा हरविली
थपडीच्या झंकाराने
कनक-लिपीने नोंद कोरली
आज नव्या इतिहासाने २
गंगाजळिचे मालिक त्यांच्या
कुलधर्माची तरवार
पोटासाठी वणवण करुनी
केलिस चुटकीमधि पार ३
जुलमाच्या चाबूक झडीतही
खवळे सिंहाचे पाणी
बेबंदशाही टांकसाळ जरि
वाजतात अस्सल नाणी ४
शिणला डोळा आज नव्याने,
रोमांचावरती नाचे
करडे दर्पण उजळ जहाले
काळाच्या क्षितिजावरचे ५
केशवजी झुंजार लेखका
अभिनंदन मुजरा घ्याया
शाहिराची लेखण चाले
मर्दाची गाणी गाया ६
स्वतंत्र तेतीस कोट जनांना
तुफान होऊन कधि काळी
बेदर्दीने मुजरा करणे
आहे का आमुच्या भाली ७
-कवि आनंद
वसंतविहार आणि आनंद यांच्या जोडीनेच श्री. गो. गो. अधिकारी ऊर्फ कवि `कमलावर` यांचाही प्रबोधनाला अधूनमधून स्नेह-सहकार लाभत असे.
सरकारी रुपेरी बेडी अखेर तोडली
सरकारी नोकर असतानाच मी प्रबोधन पाक्षिकाचा संसार थाटला. हे मागे सांगितलेच आहे. "वेळ आली तर भीक माग, पण या इंग्रेज सरकारची नोकरी करू नकोस", असे मातोश्री ताई वरचेवर सांगत असे, पण सन १९१४ च्या पहिल्या महायुद्धाच्या प्रलयात तोच मार्ग मला पत्करावा लागला १० वर्षे सरकारी नोकरीत काढल्यावर विचित्र बऱ्यावाईट अनुभवांचे गाठोडे साचत गेले. एकीकडे नोकरी नि दुसरीकडे बहुजन समाज जागृतीचे कार्य अशा परस्पर विरुद्ध दोन टोकांवरच्या डगरीवरचा कसरती खेळ माझ्या स्वभावाला पटेनासा झाला. सदसद्विवेकबुद्धी सारखी टोचण्या देऊ लागली. समांतून सरकारी धोरणांवर कडाडून टीका करायची आणि प्रबोधनात `मानसिक दास्यविरुद्ध बण्ड` विषयावर स्पष्टोक्तीची लेखमाला लिहायची, हे तिला सहन होईना. इमाने इतबारे सेवा करायची तर एक सरकारची तरी कर, नाहीतर तिला लाथ मारून बहुजन समाजाच्या सेवेला वाहून घे असा ताईचा सारखा नेचा चालू झाला. उदरभरणाचे काय, प्रबोधन आणि ग्रंथमाला ते पोटापुरते देतच आहे. मग हवी कशाला ही सदसद्विवेकाशी प्रसारणा नि दरमहा अडीचशे रुपड्यांचा मोह? बस्स! सन १९२२ च्या फेब्रुवारीत दिला सरकारी नोकरीचा राजीनामा आणि झालो मोकळा.
देता किती घेशील दो कराने?
नोकरी सोडल्याचे वृत्त जाहीर होताच अकल्पित व्यक्तींकडून अयाचित देणग्यांचा माझ्यावर सडा पडू लागला. पहिली तारेची मनिआरडर आली बडोद्याचे दि. ब. समर्थ यांचेकडून रु. ६० ची. तारेत मजकूर :
DON`T LOSE HEART. WORK ON HEART WITHIN GOD ABOVE.
देवास छोटी पातीचे महाराज श्रीमंत मल्हारराव बाबासाहेब यांचेकडून रु. ५१, दादरचे श्रीमंत मोतीरामशेट वैद्य रु. ६०, श्री भगवंत चि. सामंत रु. २०, नागपूरचे स्नेही कविवर्य नारायणराव बेहेरे रु. २५. परळचे व्यापारी श्री. गोविंदराव शिंदे रु. ५०. त्यावेळी अनामिक राहू इच्छिणारे पण आज नाव उघड करायला हरकत नाही, असे त्याकाळचे प्रबोधनभक्त नि स्नेही श्री. सदोबा काजरोळकर रु. ५०. खूप लांबलचक यादी आहे ती. प्रबोधन पाक्षिक, ग्रंथमाला आणि गावोगावची व्याख्याने या माझ्या कार्याला महाराष्ट्रात काही पाठिंबा आहे काय? या तोवरच्या माझ्या शंकेचा आता भरपूर निरास झाला. ग्रंथांची विक्रीही सपाटून होऊ लागली.
दादर पश्चिम विभागात पोष्ट मी आणवले
पत्रे वगैरे टाकण्यासाठी दादर पोलीसचौकीजवळ एक लाल पेटी होती. दादर पोष्ट हापीस होते मेनरोडवरच्या एका चाळीत. दोन खोल्यांच्या एका ब्लॉकात पोष्टमास्तरांचे बिऱ्हाड नि एकात पोस्ट हापीस, ही व्यवस्था होती. दर पंधरवडयाचे प्रबोधनाचे दीडदोन हजार प्रतींचे गाठोडे, पोस्टिंगसाठी मेनरोडवर न्यायचे. व्हिप्या त्यावेळी अनरजिस्टर्ड असल्यामुळे ग्रंथांच्या बुकपोस्टाची गोणती हमालाकडून नेऊन पोस्टात आदळावी लागत. ही अडचण माझी एकट्याचीच नव्हती. ज्योतिषाचार्य प्रधान यांचे ज्योतिर्माला मासिकही याच पश्चिम भागाला निघत असे. दादरच्या वाढत्या लोकसंख्येला अनुसरून पश्चिम भागाला पोष्ट असावे, अशा अर्जावर शेकडो लोकांच्या सहया घेऊन मी खटपट चालू केली. चौकश्याचे सरकारी गुऱ्हाळ संपल्यावर आणि मी दररोज १५० ते २०० व्हिप्याची बुकपोष्ट गॅरण्टीने नव्या पोष्टात देतो, अशी हमी दिल्यावर सन १९२२ (कदाचित २३ असावे) जानेवारीच्या १ ल्या तारखेला पश्चिम विभागातले पहिले स्वतंत्र पोष्ट खांडके बिल्डिंग नं. ५ च्या कोपऱ्यात चालू झाले.
एक सब पोष्टमास्तर आणि एक खुंटाच्या सेवक एवढा स्टाफ लाभला. पोष्ट चालू होताच मनिऑर्डरी करण्यासाठी भिक्षुकांचा तांडा गराडा घालून उभा ठाकला. बिचारा एकटा नवथर मास्तर तर भेदरूनच गेला. तशात आमचे व्हिप्यांचे गोणते येऊन दाखल झाले. दादर पोष्टाला मदतीची हाक मारावी लागली. थोड्या दिवसांनी सर्व काही सुरळीत चालू झाले. एकदा एखादी सार्वजनिक सोय झाली, म्हणजे तिच्या मुळाशी कोणत्या कर्त्याच्या खटपटींचा दगड पायात पुरलेला आहे. या कर्ता कर्म क्रियापदाची फारशी कोणी चौकशी करण्याची यातायात करीत नाही.
अमेरिकेहून विष्णूपंत ओकाचे पत्र
विष्णूपंत ओक अमेरिकेला गेल्यानंतर त्याचे पहिलेच आणि अखेरचे एक पत्र प्रबोधनच्या ता. १ जुलै १९२२च्या अंकात अमेरिकेने केलेली विचारक्रांती या मथळयाखाली छापले होते. त्यातील काही भाग मुद्दाम माझ्या जीवनगाथेत समाविष्ट करीत आहे.
`प्रिय बंधू प्रबोधनकार ठाकरे`
"महात्मा गांधींच्या मुत्सदेगिरीचा न्यायीपणा जर कशात अत्यंत स्पष्ट रीतीने व्यक्त होत असेल तर तो त्यांनी हाती घेतलेल्या अस्पृश्यतेविरुद्ध मोहिमेतच अस्पृश्यतेच्या बेजबाबदार कुटिल कल्पनेला थारा दिल्याचे पाप, अस्पृश्यांखेरीज इतर सर्व जातींच्या माथी आहे. आपल्या प्रबोधनाच्या हाकेने त्या सर्वांना जागे करा!"
"अस्पृश्य बांधवांच्या केवढ्या अफाट मानवी संघशक्तिला आपण सत्त्वहीन करून टाकले आहे बरे?”
"एकवटलेल्या सुसंघटित मायभूमीचे अस्तित्व जर आपल्याला इष्ट असेल, तर प्रत्येक महाराला (हा शब्दच मुळी अन्यायसूचक आहे.) हरएक चांभाराला मी हिंदी समाजाचा एक महत्त्वाचा इभ्रतदार घटकावयव आहे, या जबाबदारीची साभिमान जाणीव होऊ द्या."
"काय आश्चर्यची गोष्ट आहे पहा. ज्या अतिशूद्राला आपण आपल्या उच्चवर्णत्वाच्या घमेंडीने दूर लोटतो. तोच मनुष्य परधर्मात जाऊन परकी वेषात बूट पाटलून हॅट घालून येताच, हँ हँ हँ करीत त्याच्याशी शेकहॅण्ड करायला आम्ही शरमत नाही. आम्हाला पिऱ्या म्हार शिवला तर विटाळ होतो, परंतु तोच पिऱ्या पेद्रू दुमिंग होऊन येताच त्याच्या तोंडाजवळ तोंड नेऊन चिरुटावर चिरुट पेटविताना मात्र आमचा धर्म मरत नाही किंवा विटाळही होत नाही."
"मिस्टर ठाकरे, आपण एकदा माझ्याजवळ बोलला होता आणि ते मला आज पूर्णपणे पटत आहे की विधायक आणि विघातक हे नुसते लपंडावीचे शब्द आहेत. ज्यांना काही करायला नको, नुसते ऐदी बसून गप्पा मारायला पाहिजेत, त्यांच्या तोंडीच हे शब्द असतात. खरं म्हटल तर आधी नाश मग पुनर्घटना हेच सनातन तत्त्व आहे."
"म्हणूनच त्या दिशेने होणाऱ्या आपल्या प्रबोधनाच्या प्रयत्नांविषयी आता मला पूर्वीपेक्षा दसपट सहानुभूती वाटत आहे. कै. आगरकरांचा दूरदर्शीपणा मला आता दिसून येऊ लागला आहे. हिंदू मिशनरी सोसायटीच्या सांप्रदायाची महती अंतःकरणापासून पटत आहे."
आपला नम्र,
विष्णु विठ्ठल ओक
2026 Center Street,
Berkeley, Calif., U.S.A.
Ist May 1922.
छत्रपतीच्या मृत्यूनंतर
अचाट पराक्रमाचा लोकोत्तर पुरुषोत्तम जोवर लोकोध्दारक आंदोलनाच्या धुरेवर उभा असतो. तोवर त्या आंदोलनाचा झगझगीत भाग जनांचे डोळे दिपवून सोडतो. अचानक तो या जगद्रंगभूमीवरून नाहीसा झाला रे झाला की मग मात्र `दिसले ते सारे सोने नव्हते` या भ्रमालाही त्या पुरुषाच्या थडग्यात गाडण्याचा प्रसंग उद्भवतो. करवीरकर छत्रपती शाहू महाराज जोवर हयात होते. तोवर ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे यच्चावत् बहुजन समाजाची एकमेव उद्धारकर्ती चैतन्यदेवता वाटत होती. त्यांचा मृत्यू होताच सारीच बजबजपुरी माजली. महाराजांच्या खुल्या सुटलेल्या थैलीवर मनमुराद चरण्यासाठी जनसेवेची निरनिराळी बाशिंगे बांधून, फार काय पण सरकारी नोकऱ्या सोडून, चळवळीचे पुढारी म्हणून त्यांच्या भोवती जमलेल्या शेकडो लोकांचे पितळ उघडे पडले. या चळवळीचे ध्येयच मुळी कधी ठरलेले नव्हते किंवा तिच्या घटनेचाही कधी कोणी विचार केला नव्हता, परिषदा भरल्या. शहरी चळवळ्यांच्या रंगाढंगाच्या नकला रग्गड केल्या, पण ध्येय घटनादी मुद्यांचा विचारच झाला नाही, सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळ यांच्या व्याख्या नि मर्यादा ठरल्या गेल्या नाहीत. याचा परिणाम खुद्द शाहू महाराजांच्या हयातीतच त्यांना भोगावा लागला. सत्यशोधक तत्त्वांचा विचका उडाला. म. फुल्यांची शिकवण व्याख्यानात टाळ्या आणि निवडणुकात व्होट मिळविण्यापुरती वापरात उरली सगळ्याच आंदोलनाचा गोंधळ हुकमतीबाहेर गेला आणि अखेर-
"सत्यशोधक समाजाशी माझा कसलाही संबंध नाही." असा जाहीरनामा महाराजांना प्रसिद्ध करावा लागला यापूर्वी हाच प्रसंग रा. ब. लठ्ठे आणि भास्करराव जाधव यांना केसरी पत्रातून साजरा करावा लागला होता. महाराजांचा अवतार संपल्यावर बामणेतरी पुढाऱ्यांतच चुरशीचे सामने चालू झाले मॉण्टफर्ड रिफॉर्म्सची नवी कौन्सिले चालू होण्याच्या सुमाराला तर या पक्षात भयंकर उत्पात माजले. मराठा मराठेतर भेदाने उचल खाल्ली. याच वेळेपासून स्वजातीवर्चस्वाची भाषा वरघाटी मराठे अट्टहासाने बोलू लागले. बेळगावच्या `राष्ट्रवीर` पत्रासारखी मराठ्यांची जबाबदार पत्रे मराठेतरांना उघड उघड धमक्या देऊ लागली. चळवळीची दिशा जातिभेदाच्या ठोकरीमुळे अज्जिबात बदलली. कोणशीलदाऱ्या, दिवाणगिऱ्या आणि सरकारी नोकऱ्या, त्यासुद्धा लायकीच्या नव्हे, तर जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात फक्त मराठेजातियांनाच मिळाव्या. एवढ्याच क्षुद्र बिंदूवर चळवळीची भिंगरी गरगरू लागली.
मागासलेले पडले खेड्यात. बरेचसे शहरी गिरण्याच्या वेढ्यात, शेतकरी वर्ग सावकारांच्या चक्रवाढी तेढ्यात आणि बामणेतरी छापाचे मराठे पुढारी कोणशीलदाऱ्या दिवाणगिऱ्या पटकविण्याच्या तिरंगी चौरंगी परस्पर लढ्यांच्या सामन्यात अखिल बामणेतरी जनतेच्या पाठिंब्याचे भरताड भरगच्च दाखविण्यासाठी सुरवातीला अस्पृश्यांच्या कळवळ्यांची नाटके रंगविण्यात येत होती. पण जेथे स्पृश्य कंपूतही मराठा मराठेतर भेदाची भगदाडे पडली आणि रा. ब. लठ्ठ्यांसारखे अव्वल दर्जाचे सत्यशोधक चळवळीला रामराम ठोकून अलिप्त बसले, तेथे त्या मुक्या भोळ्या अस्पृश्यांची पर्वा कोण करणार?
भिंतीचा निर्जीव हंस
त्याने गिळिले हारास, भटाचे वर्म जसे त्याच्या सुताच्या जानव्यात, तसे माझेही एक वर्म त्याकाळी सर्वश्रुत झालेले होते. या सुमाराला प्रबोधन पाक्षिकाचा प्रसार महाराष्ट्रभर झाला होता. जाहिरातीच्या बंडापासून ते अलिप्त होते. ३००० वर्गणीदारांच्या वर्गण्या आणि ग्रंथमालेचा प्रसार यावर पाक्षिकाचा नि माझा संसार ठाकठीक चालला होता. अधूनमधून काही प्रबोधन-भक्तांच्या रोख देणग्याही येत असत
एक दिवस स्वाध्यायाश्रमात लेखनकार्य करीत बसलो असता. अचानक एक गृहस्थ भेटीला आले. माझ्या हातात १०० रुपयाची नोट देऊन बोलले. "प्रबोधनाच्या कार्याला सुरवातीची देगणी पुन्हा लवकर मी भेटेन." एवढेच बोलून ते गृहस्थ जायला निघाले. नाव गाव विचारले तेव्हा "माझे नाव आत्माराम चित्रे, पत्ता मोहन बिल्डिंग, गिरगाव" बस्स. ते गेले निघून.
२-३ महिन्यांनी आत्मारामजी पुन्हा आले आणि "प्रबोधनाच्या विकासासाठी स्वतंत्र छापखान्याची सोय झाली पाहिजे. तुम्ही एखादा चलाऊ छापखाना विक्रीला असेल तर पहा. मीही पहातो आणि घेऊन टाकू आपण तो. त्याची जबाबदारी माझ्यावरच." या अचानक योगायोगाने मी चकितच झालो.
दोन तीन महिने मी तशा छापखान्याचा पुष्कळ शोध केला. पण जमले नाही. आत्मारामजी अधूनमधून येऊन चौकशी करायचे. एक दिवस अचानक दोन प्रहरी ३ च्या सुमाराला आत्मारामजी स्वाध्यायाश्रमात आले. लेखनकार्य संपवून मी ईझिचेअरमध्ये पडलो होतो. "अहो, झोपला काय असे? चला उठा. कपडे करा. मोटर खाली उभी आहे. चला चला." मला पुढे काही बोलूच देत ना. निघालो. गाडीत एक चकार शब्द गृहस्थ बोलला नाही. आमची गाडी काळबादेवी तार हापिसाच्या वाडीत गेली. वाडीच्या टोकावरच्या एका चाळीतल्या दर्शनी भागावर `थॉर्न प्रिंटिंग प्रेस` अशी पाटी लावलेल्या खोलीत आम्ही गेलो. "हा तुमचा छापखाना. हे कामगार. ताब्यात घ्या. चार महिनेपर्यंत सारा खर्च मी चालवीन. तोवर तुम्ही कामे मिळवून छापखाना स्वतःच्या पायावर उभा राहील, असे करण्याची जबाबदारी तुमची. पुढे माझा संबंध उरणार नाही." हे सारे स्वप्न आहे की काय, मला काहीच उमगे ना. मग त्यांनी छापखाना कसा तेथे आणला. त्याची हकिकत सांगितली.
"तुमच्या हातून काहीच होईना, तेव्हा आम्ही खटपट केली. कोटांत थॉर्न कंपनीचा छापखाना विकाऊ असल्याचे कळले. मी तो खरेदी केला नि ही जागा पाहून आणला येथे." चर्चगेट स्ट्रीटवर ऑलिवर टाइपरायटर कंपनी होती. तेथे माझे स्नेही आठवले आणि वैशंपायन सेल्समन होते. मालक मि. थॉर्न विलायतला चाललेले होते. माझा नि या कंपनीचा परिचय जुनाच. या छापखान्यात फक्त इंग्रेजी हडिंग्जचा टाइपच काय तो भरलेला. आत्मारामजींच्या सांगण्यावरून मी निर्णयसागराचा मराठी टाइप भरला.
रोज सकाळी १० च्या सुमाराला छापखान्यात जायचे. दोन वाजेपर्यंत काम मिळविण्यासाठी व्यापारी कंपन्यांत भटकायचे. असा क्रम चालू झाला. थोडे थोडे काम मिळू लागले. महिनाअखेर आत्मारामजी स्वतः छापखान्यात येऊन भाडे व नोकरांचा पगार द्यायचे. आवक जावक जमाखर्च पहायचे आणि जायचे. असे २-३ महिने गेले असतील नसतील. तोच एक दिवस बातमी आली की आत्मारामजी आजारी आहेत. मी भेटीला गेलो. आजार बळावला होता. उपचार चालले होते. आणि-आणि-२ ऱ्या का ३ ऱ्या दिवशी मोहन बिल्डिंगमध्ये जातो. तो प्रेतयात्रेची तयारी नजरेस पडली. खलास! एक जातिवंत जिव्हाळ्याचा पुरस्कर्ता गेला!
१० व्या किंवा ११ व्या दिवशी आत्मारामजींचे कनिष्ठ बंधू छापखान्यात आले आणि एखाद्या पोलीस हापसरच्या दिमाखात "हू आर यू हिअर?" म्हणून विचारू लागले. "मी कोण आहे. ते विचारायला तुम्हाला स्वर्गात जावे लागेल. काही सभ्यपणा माणुसकी आहे का नाही तुला? मी तुला ओळखत नाही गेटाउट", "दिला हुसकून त्याला विचार केला. सारा व्यवहार झालेला तोंडातोडी फक्त तो आत्मारामजीच्या गुजराती सॉलिसिटरांच्या समक्ष. कागदपत्र होणार होते. इतक्यात हा प्रसंग! अशा परिस्थितीत आपणच व्यवहार तोडून कोर्ट कचेऱ्यांचा उपद्व्याप टाळावा हे बरे. मी सॉलिसिटरांना फोन केला. ते आले. इतक्यात आत्मारामजींचे मध्यम बंधू दत्तोपंत आले त्यांनी धाकट्या भावाच्या उर्मट वर्तनाबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
"हा छापखाना आत्मारामजींनी ठाकरे यांना बक्षिस दिलेला आहे." असे सॉलिसिटरांनी स्पष्ट सांगितले, पण मीच खुलासा केला की "ज्यांनी माझ्यावर इतका विश्वास दाखविला नि छापखाना काढून दिला, तो पुरस्कर्ताच अकाली दिवंगत झाल्यावर, मला या छापखान्याची गरजच नाही. मी तो क्षणभरही चालविणार नाही." असे सांगून लेखी स्टेटमेंटने मी तो सॉलिसिटराच्या हवाली केला आणि त्याची पावती घेऊन त्यांच्या समक्षच निघून घरी परत आलो ही कहाणी प्रबोधनात समग्र छापून प्रसिद्ध केलेली सर्वश्रुत होती. ठाकरे यांना छापखाना पाहिजे, या एकाच वर्मावर लक्ष केन्द्रित करून कूपरने भाऊरावला माझ्याकडे पाठविले होते.
भाऊराव पाटलांचा स्नेहसंबंध
नेमक्या बजबजपुरीच्या प्रारंभालाच भाऊराव पाटलांचा नि माझा ऋणानुबंध जमला. सन १९२२ च्या सातारा शिवजयंती उत्सवात भाऊरावची नि माझी पहिली जानपछान झाली. सातारा रोड स्टेशनावर स्वागताला भाऊरावच आला होता. तेथपासून तो माझ्या ३-४ दिवसांच्या मुक्कामात हनुमानासारखा तो माझ्या दिमतीला होता. अशी मंडळी गावोगाव माझ्या व्याख्यानांच्या दौऱ्यात कितीतरी भेटली नि भेटत असत. पण भाऊरावाच्या स्नेहाचा एक मोठा इतिहास घडणार आहे. याची त्याला किंवा मला काहीच कल्पना नव्हती.
एक दिवस पहातो तो घोंगडेधारी पाटलाची स्वारी दत्त म्हणून स्वाध्यायाश्रमात हजर. मांजरपाटी जाडेभरडे धोतर, अंगात तसलाच एक घोळ सदरा, माथ्यावर कांबळाची टोपी खांद्यावर भले मोठे घोंगडे, पठ्ठ्या जो आला तो लगेच आश्रमीय मंडळीत एकतान रंगला. सकाळी नळावर स्नान करून बाहेर जायचा तो रात्री मुक्कामाला यायचा. सकाळी फक्त चहा. जेवणाबिवणाची तोसीश नाही. भोजनोत्तर रात्री माझ्या चर्चा व्हायच्या. कशावर? मागस बहुजन समाजात आणि प्रामुख्याने अस्पृश्य समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी बोर्डिंग स्थापण्याची योजना.
भाऊरावाचा पूर्वाश्रम
किर्लोस्कर कंपनीच्या लोखंडी नांगराचा सेल्समन म्हणून भाऊरावाने उभा महाराष्ट्र पायदळी घातला होता. त्यावेळी स्वारीचा थाट थेट अपटुडेट नेकटाय कॉलरी साहेबी असायचा. फर्स्ट क्लासचा प्रवास. लहान थोरांशी ओळखीचे जाळे विशाल, नागरनिर्माण पंचातल्या खाचाखोचा तोंडपाठ. पण मागसांच्या शिक्षणाचे वेड सारखे डोक्यात खेळत असायचे. प्रश्न नुसत्या तोंडच्या वाफेने सुटणारा होता थोडाच? त्यासाठी कोठे ना कोठे. सुरुवातीला लहानसाच का होईना, पण पैशाचा झरा उत्पन्न केला पाहिजे. अडचणी संकटांवर मात कशी करावी. यात भाऊरावचे डोके तरबेज.
किर्लोस्करांसारख्या दुसरा नांगराचा कारखाना आपल्या हुकमतीखाली आसपास काढता आला, तर? त्या धंद्यावर मिळणाऱ्या गडजंग फायद्याच्या काही, अल्पच का होईना, भागावर आपली बोर्डिंगाची कल्पना साकार करता येईल. या मनोमन धोरणाने त्याने अनेक व्यापारी पिंडाच्या धनाढ्यांशी चाचपणी बोलणी केली. अखेर सातारच्या धनजीशेट कूपरला योजना पटवून कारखान्याची त्याने श्री काढली.
किर्लोस्करातल्या ९-१० पटाईत कलावतांसह भाऊरावने किर्लोस्करांना राजीनामा दिला आणि सातारा रोड पाडळीच्या मैदानावर कूपर एजिनियरिंग वर्क्सची स्थापना केली. सातारा उत्सवाच्या अगोदरच तो कारखाना चालू झालेला होता. कारखान्याच्या उत्पादनाची मदार ते ९-१० इमानी कामगार आणि त्यांचा जिवाभावाचा नेता भाऊराव यांच्यावरच होती. अर्थात भाऊराव म्हणजे कूपरचा उजवा हात. त्याच्याशिवाय कारखान्यातले पान हलायचे नाही.
कारखान्याचा हा सौदा ठरविताना भाऊरावने कूपरला एक अट घातलेली होती. त्या अटीवरूनच पुढे अनंत कटकटींचा इतिहास घडला. कारखान्याला जो निबळ फायदा होईल. त्यातला १० टक्के भाग कूपरने भाऊरावच्या बोर्डिंगी योजनेच्या विकासासाठी अगत्य दिला पाहिजे. हे सारे तोंडातोडी ठरलेले. माणसाच्या शब्दांवर विश्वास ठेवायचा आणि त्यात जरा कुचराई झाली का त्याला सफाघाट तोडायचा, हा भाऊरावच्या स्वभावाचा मामला.
गळाला लागला मासा
बुद्धिः कर्मानुसारिणी का ग्रहानुसारिणी? हा सवाल सुटसुटीत सोडविणे निदान माझ्या तरी बुद्धीच्या आवाक्याबाहेरचे आहे. उज्वल भवितव्याचा एखादा मार्ग सरळसोट दिसावा. जिव्हाळ्यांच्या अनेक इष्टमित्रांनीही तो तसाच असल्याची ग्वाही द्यावी, आपणही सरळ इमानाने त्या मार्गात पुढे पाऊल टाकावे, कर्तव्य चोख बजवावे, आणि कल्पनेच्या स्वप्नातही चुकून कधी न आलेल्या अनपेक्षित भलत्याच भानगडी समोर उभ्या ठाकाव्या आणि त्यांतच आपल्या सर्वस्वाचा अचानक होम व्हावा, या अवस्थेला बुद्धीला तरी कशी जबाबदार धरावी? बरे. ती सुबुद्धी नव्हती. कु-बुद्धी होती. हेही सिद्ध होत नाही. मग तो काय ग्रहदशेचा फेरा समजावा? वाटेल ते समजा. पण भाऊराव पाटलाच्या सल्ल्याने दादरला थाटलेला खाजगी नि व्यावहारिक संसार मोडून मी सातारा कूपरच्या दामोदरी उबाऱ्यात जाण्यात सर्वस्वाचे होळकुकडे करून घेतले. एवढे मात्र खरे. कसे? त्याचीच कहाणी यापुढे मी सांगणार आहे.
भाऊराव नि मी समगोत्री
मे १९२२ पासून तो १९२३ चे मध्य उलटेपर्यंत भाऊराव किती वेळा सातारा ते मुंबई आला आणि स्वाध्यायाश्रमात बिऱ्हाडाला टेकला. याची गणती करता येणार नाही. लोकसेवेविषयी दोघांच्याही भावना नि कल्पना एकगोत्री. तशात `सहासे श्रीः प्रतिवसति` हा दोघांचाही आत्मविश्वास. त्यामुळे हा हा म्हणता आम्ही दोघे जणू काय पाठचे भाऊ, इतका परस्परांचा जिव्हाळा जमला. किर्लोस्करांना तोडीला तोड असा लोखंडी नांगराचा कारखाना कूपरने चालू केला. त्याला भाऊराव नि त्याचे नऊ साथीदार मूळ कारण कूपरची सारी मदार भाऊरावावर. कारखान्याच्या जाहिरात खात्यावर कोणतरी माहीतगार कलमबहाद्दर नि चित्रकार अवश्य. एक जबरदस्त वृत्तपत्रकार आणि पट्टीचा वक्ता म्हणून माझी ख्याती सर्व महाराष्ट्रभर झालेली होती. त्यात सन १९२३ च्या मॉण्टफर्ड रिफार्म्सच्या नवीन कौन्सिलांच्या निवडणुका माथ्यावर अलेल्या कूपरला निवडणूक लढवायची होती. माझ्यासारखा हरहुन्नरी नि कल्पक असामी आपल्या संग्रही कायमचा असावा, हे कूपरचे धोरण म्हणा, मनीषा म्हणा, भाऊराव पाटलाने अगदी निःसंकोच नि मोकळया मनाने मला पटवून दिले. भाऊरावच्या सरळ मनोवृत्तीविषयी मीही अगदी निःशंक. कूपर स्वत: ही २-३ वेळा मला आश्रमात भेटून गेला होता. "तुम्ही जसा हवा तसा छापखाना काढा. लागेल तो पैसा मी पुरवतो. रहाण्यासाठी घर बांधून देतो कारखान्याचे जाहिरात खाते तुमच्या स्वाधीन तुमच्या प्रबोधनाच्या स्वतंत्र धोरणाविरुद्ध मी काढणार नाही. ते तुम्ही स्वतंत्रपणे खुशाल चालवावे.
कौटुंबिक खर्चासाठी दरमहा रु. १५० सन्मानवेतन मी देत जाईन, शिवाय छापखान्याच्या निवळ नफ्यात आठ आणे भागी." हा करार नि तोही तोंडीच बरे का. भाऊरावाच्या समक्ष ठरला नि मुंबईहून छापखान्याचे सर्व साहित्य यंत्रसामग्री खरेदी करून एजंटामार्फत सातारा रोडला रवाना करण्यात दंग झालो. तेथेही पत्र्याची एक शेड उभारून येणारा माल तेथे स्टॉक करण्याचा उपक्रम चालू झाला. या कामी मुंबईचे आमचे एजंट्स म्हणून ताम्हणे बंधू यांची नेमणूक मी केली. खरेदी मालाची कूपरच्या सह्यांनी मुंबईचे त्याचे सावकार हरि पांडुरंग कंपनी परस्पर फेड करीत असे.
सातारी हुरडा चाखून तर पहा
मुंबईहून सातारा रोडला प्रयाण करण्यापूर्वी तेथे प्रत्यक्ष जाऊन तेथली परिस्थिती समक्ष पहाण्याचा भाऊरावने आग्रह केला नि तो अगदी वाजवी होता. १९२३ च्या निवडणुकांचे ढोल नगारे सातारा जिल्हाभर वाजू लागले होते नि त्याचे पडसाद वृत्तपत्रात उमटतही होते. सातारा जिल्ह्याला आमदारकीच्या जागा तीन मराठयांची वसती ब्राह्मणांपेक्षा विशेष तेव्हा तीन जागांपैकी दोन ब्राह्मणेतरांना नि एक ब्राह्मणांना, अशी प्रथमच वाटणी केली, तर निवडणुकीच्या हैदोसाची गरजच उरणार नाही, असा विचार रा. ब. काळे यानी कूपरमार्फत ब्राह्मणेतर पक्षाला आणि मलाही पत्राने कळविला. एखादा समक्ष मुंबईला येऊन रावबहादुर मला भेटले नि ती योजना समजाऊन दिली. त्यावेळी ब्राह्मणेतर पक्ष म्हणजे उपटसुंभ पुढारीबुवांचा मासळी बाजार बनला होता. तथापि काही तत्त्वनिष्ठ पुढाऱ्यांनी बेळगावला डेक्कन ब्राह्मणेतर लीग नावाची एक संस्था चालविली होती. त्या संस्थेला रा. ब. काळे नि सोमण यांची सूचना मान्य झाली आणि साताऱ्यातर्फे खानबहादुर धनजीशहा कूपर आणि साताऱ्याचे एक तरुण तडफदार वकील आचरेकर यांची ब्राह्मणेतर पक्षातर्फे नेमणूक केली. ब्राह्मणपक्षातर्फे सोमण नेमण्यात आले.
या नेमणुकीचा सर्वत्र अधिकृत पुकारा करण्यासाठी लीगचे पुढारी गावोगाव जाहीर सभा घेत होते. अशा पैकीच एक सभा सातारा रोडला घेण्याचे ठरले आणि त्या सभेला मी अगत्य यावे अशी कूपरची तार आली.
जाधवरावांचा बीचमे मेरा चांदभाई
पाडळीच्या सभेला अंदाजे ४००-५०० लोक खेड्यापाड्यांतून आले होते. सर्व पुढारीही हजर होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माझी स्थापना झाली. कूपर-आचरेकर यांची लीगच्या ठरावाला पाठिंबा देणारी भाषणे झाली. त्यांच्या भाषणाला आक्षेप घेण्याचा जाधवरावांनी ४-५ वेळा यत्न केला, पण मी त्यांना बोलू दिले नाही. "अस्तिपक्षी भाषणे झाल्यावर. तुम्हालाही आपली मते मांडण्याचा अवसर मिळेल. पण भाषणात अडथळे आणू नका. असा स्पष्ट इषारा मी देत होतो. जाधवरावांचे भाषण झाले. ठराव मताला टाकता, मूळ ठराव, एकट्या जाधवरावाच्या विरुद्ध मताशिवाय, एकमताने पसार झाला. सभा संपली. जाधवरावांचे एकच म्हणणे होते की मरणापूर्वी शाहू महाराजांनी मला सातारा जिल्ह्यात कौन्सिलात जाण्याची अनुज्ञा दिली होती.
मी त्याप्रमाणे निवडणूक लढविणार. मला बेळगाव लीगचा ठराव मान्य नाही. एकीकडे पाहुणे मंडळी गप्पागोष्टीत टोळीटोळीने ठिकठिकाणी बसली आहेत, कारखान्यातल्या भट्टयावर भात आमटी शिजत आहे आणि जाधवराव ठिकठिकाणच्या टोळक्यात जाऊन, आपल्या मताचा प्रचार करीत आहेत, असा देखावा निर्माण झाला. अखेर काय? तर रा. ब. काळ्यांनी सुचविलेली सोयीस्कर योजना फोल झाली आणि हैदोसासाठी सारे उमेदवार अस्तन्या सरसावून तयार झाले.
यानंतर, पाडळी सभेचा कूपर-आचरेकर संमतीचा ठराव बेकायदेशीर ठरविण्याचा जाधवरावांनी प्रचार चालविला. त्यावर लीगतर्फे पुन्हा एक निवडक मंडळीचे प्रो. लठ्ठे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीमंडळ पाडळी येथेच बोलावण्यात आले. प्रो. लठ्ठे आधीपासूनच ब्राह्मणेतरी चळवळीला रामराम ठोकून स्वस्थ बसले होते त्या चौकशी मंडळाने २०-२५ जबाबदार खेडूत-पुढाऱ्यांच्या जबान्या घेतल्या आणि झालेला ठराव निश्चित कायदेशीरच होता. असा निकाल दिला.
निवडणुका, प्लेग नि मुंबईचा संप
पाडळीहून परत आल्यावर एकाएकी मी टायफाईड निमोनियाने आजारी पडलो. तिकडे छापखान्याच्या साहित्याचे पेटारेच्या पेटारे जाऊन पडलेले आणि मी आजारी. भाऊराव तातडीने येऊन बिछान्याजवळ बसला. कूपरही धावून आला. १५ दिवसांनी ठाकठीक प्रकृती होताच, दादरच्या आश्रमीय सवंगडयाची अत्यंत कष्टाने रजा घेऊन मी सातारा रोडला एकटाच गेलो. बरोबर श्री. कद्रेकर आणि दत्तोबा देशमुख यांना माझे सहाय्यक म्हणून घेतले.
छापखाना चालू केला. सातारच्या निवडणुका आणि प्लेगाची धामधूम, हातात हात घालून जोरदार चालू झाली. त्यातच १९२३ च्या मुंबईच्या गिरण्यांच्या प्रचंड संपाने आणखी भर घातली. सातारच्या एका डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आम्ही प्लेगने पछाडलेल्या रोग्यांना औषधोपचार करण्याचा एक दवाखाना छापखान्यातच चालू केला. पाडळी नि आसपासच्या खेडयातून रोज किमान २०-२५ रोग्यांचे नातलग औषधासाठी यायचे. हे डॉक्टरी काम आणि देशमुख करायचे, त्यामुळे दत्तोपंत देशमुख तेथे डॉक्टर म्हणून ओळखले जाऊ लागले. हा दवाखान्याचा उपक्रम कूपरच्या निवडणूक मोहिमेतीलच एक भाग होता. खेड्यातले लोक टोचून घ्यायला नाकबूल असत त्यावर आम्ही उपाय काढला.
पाडळीचा आठवडे बाजार दर गुरुवारी भरायचा. सरासरी १००-१२५ स्त्रीपुरुष बाजाराला यायचे. एका गुरुवारी सातारच्या डॉक्टरांना घेऊन कूपर सकाळीच आला. आम्ही तिघांनी बूरहॅट्स घातल्या आणि बाजारतल्या सर्व लोकांना चलो चलो करून छापखान्यात आणले. दहा बारा बायकांसमक्ष एका बाईला डॉक्टराने टोचले. ती म्हणाली "काय बी व्हत नाय. मुंगी चावल्यागत जरासं व्हतं." हे पाहिल्यावर अंदाजे शंभर स्त्रीपुरुषांनी भराभर टोचून घेतले.
एकीकडे निवडणुकांतील लढवय्यांचे मॅनिफेस्टो छापण्याची गडबड, त्यातच प्लेगोबाने उडविलेला हाहाकार आणि मुंबईच्या गिरण्यांच्या संपामुळे अन्नान्न होऊन दररोज परत येणाऱ्या सातारी कामगारांच्या टोळ्या, अशा तिरंगी धामधुमीत आम्ही तिघेही अक्षरशः रात्रन् दिवस गुंतलो.
पाडळीचे साडेतीन शहाणे
सन १९२३ सालचा उत्तरार्ध. मुंबईला गिरण्यांचा संप चालू होता. लक्षावधी लोक बेकार झाले होते गिरण्यांच्या संपाने इतर कारखाने गोद्यांतही ती लाट फैलावली होती. पाडळीची हवा मोठी विलक्षण. दिवसा भयंकर उन्हाळा. इतका की छपाईचे रूळ भराभर वितळायचे. तेव्हा सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत आणि सायंकाळी (महाबळेश्वराचा थंडगार वाऱ्याचा झोत येऊन हवामान गारेगार होताच) ६ ते रात्री १० वाजेपर्यंत छापखान्याचे काम चालायचे. आम्ही सारी मंडळी रात्री १२ वाजता पुण्याहून येणाऱ्या बंगलोर मेलची वाट पहात स्टेशनवर गप्पाष्टके झोडीत असायचे. मेल आली रे आली का प्रथम माझ्या नावे येणारे `इंडियन डेली मेल, टाइम्स ऑफ इंडियाचे अंक` पोष्टाच्या पिशवीतून पोष्ट मास्तर काढून द्यायचे. त्याचे बातमी वाचन, त्यावर चर्चा चिकित्सा व्हायच्या आणि मेल गेल्यावर आम्ही छापखान्यात परतायचे नि झोपी जायचे. हा रोजचा क्रम.
याच सुमाराला बेकारीच्या नि उपासमारीच्या तडाक्यात सापडलेल्या सातारकर मजुराचे थवेच्या थवे पासिंजर गाडीने येऊन दाखल व्हायचे. त्यांत दररोज एक किंवा दोन अस्थिपंजर आणि बेशुद्ध अवस्थेत असलेले आढळायचे. गाडी आली नि इतर प्रवाश्यांनी त्याचा ओरडा केला की स्टेशनमास्तर नि पोर्टर त्या बाई किंवा बुवाला उतरून घ्यायचे. कॅटिनवाला दूध किंवा गरम चहा पाजून त्याला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करायचा. आलाच शुद्धीवर तर नाव गाव विचारून त्याची पुढे रवानगी व्हायची. कित्येक तर मरणोन्मुख अवस्थेत बाहेर काढले जायचे. आणि उपचाराचा काहीही परिणाम न होता, राम म्हणायचे.
एवढा मोठा कूपर कारखाना. पण त्यावेळी तेथे किंवा आसपास डॉक्टरी मदतीची कसलीही सोय नव्हती. एखादा मुर्दा गाडीतून बाहेर काढला का त्याच्या पुढील विधीची कायदेशीर सोय लावणे जरूर, दफन दहनाचा खर्च कूपरने मंजूर केलेला होता. पण त्या आधी ज्यूरीच्या अभिप्रायाची नि किमान पक्षी स्थानिक तलाठ्याची कागदोपत्री नोंद तरी व्हायला हवीच होती. या भानगडी करणारे आम्ही पाडळीचे साडेतीन शहाणे ठरलेले होतो. स्टेशनमास्तर, पोष्टमास्तर आणि मी असे तीन आणि स्टेशननजीकचा रॉकेल तेलाचा गुजराती व्यापारी मिळून साडेतीन स्टेशन मास्तरने निरोप पाठवला का आम्ही झोपेतून उठून स्टेशनवर जायचे. त्यावेळी पाडळीला एक क्रिस्ती तलाठी होता. त्याला बोलावून आणायचे.
या सुमाराला अप किंवा डाऊन एखादी गाडी आली तर ती थोपवून त्यातील प्रवाश्यांना मुर्द्याची ओळख पटते की काय, याचा तपास घ्यायचा. पटली ओळख आणि जवळपास त्याचे नातेवाईक असले, तर त्यांना बोलावणे जायचे. तोवर मुर्द्याला पोलीसपाटलाच्या पहाऱ्याखाली धर्मशाळेत ठेवायचा. काहीच जमले नाही, तर तलाठ्याला कारखान्यातून रु. १० देऊन मुद्यांचे दफन करायला सांगायचे. पुढचा सारा विधी गावकरी बोलावून तो पार पाडीत असे. आधीच प्लेगाचा जिल्हाभर धुमाकूळ चाललेला. त्यात मुंबईहून येणाऱ्या मुर्द्यांची भर. मुंबईचा संप चालू असेतोवर दररोज या भानगडींनी आमचा पिच्छा पुरवला होता.
इलेक्शनी कोंबड्यांच्या बामणेतरी झुंजा
तीन जागांसाठी कूपर, जाधवराव आणि आचरेकर यांचा गावोगाव नि खेडोपाडी प्रचाराचा धूमधडाका चालू झाला. एकमेक परस्परांवर नानारंगी आरोप करीत होते. त्या आरोपांची मजल मी अस्सल मराठा नि तो कमअस्सल मराठा : येथपर्यंत ओघळत जाऊ लागली. पाडळीला नव्यानेच निघालेल्या छापखान्याला या तिघांही उमेदवारांच्या प्रचारपत्रकांची छपाई मिळत गेली खरी, पण त्यांत तिघांनी माझ्यावर एक त्रांगड्याची जबाबदारी टाकली. कोणाच्याही प्रचारी रीतीचा वा नीतीचा मजकूर या कानाचा त्या कानाला कळता कामा नये. हे कसे जमणार? छापखान्यात तिघांपैकी कोणीही आले तरी पत्रकांची प्रुफे सहज नजरेला पडायची. रोज सकाळी जाधवराव-आचरेकर एकमेकांना टाळून, माझ्या भेटीला छापखान्यात यायचे. आणि अमक्या गावी आचरेकराने मला काय शिव्या दिल्या, त्याचे पुराण जाधवरावाने सांगायचं आणि जाधवराव मला कमअस्सल म्हणत सुटलाय, हे पुराण आचरेकराने मला श्रुत करायचे.
दोघांनी माझ्याविरुद्ध कसली हुल्लड उठविली आहे. याचे पुराण संध्याकाळी कूपरने माझ्या कानी घालायचे. सकाळपासून हे त्रिदोषाचे लिगाड माझ्या मागे लागलेले. दादरच्या स्वाध्यायाश्रमातले काव्यशास्त्रविनोदाचे स्फूर्तिदायक वातावरण टाकून कशाला आलो मरायला या स्वयंमन्य पुढाऱ्यांच्या कोंबडझुंजीत, असे मला झाले. इतर काही फायदा झाला नाही तरी बामणेतर पार्टी हे कसले थोतांड आहे. पुढारी कसल्या शेणामेणाचे आहेत. आणि महात्मा फुले नि शाहू छत्रपतींच्या नावावर अस्पृश्यांसगट बहुजन समाजांना फक्त आपल्या स्वार्थासाठी ते कसकसे बनवीत असतात, याचा पुरेपूर शोध नि बोध घेण्याची मात्र नामी संधी मला मिळाली.
अखेर जातिवर्चस्वाचा तवंग आलाच उजेडात
प्रचारपत्रकातला अद्वातद्वा मजकूर मी जेव्हा आक्षेप घेऊन सेन्नार करू लागलो, वैयक्तिक हेव्यादाव्याचा तपशील छापणार नाही, असे स्पष्ट सांगून तो गाळू लागलो, तेव्हा आचरेकर नि जाधवराव यांनी तसली पत्रके दुसरीकडून छापून घ्यायला सुरुवात केली. असलेच जाधवरावाचे एक पत्रक कूपरने माझ्या हाती आणून दिले. त्यातील काही मजकूर :
"सातारा जिल्हा हा बहुतांशी मराठ्यांचा आहे. येथील राज्यकारभार मराठ्यांच्या हक्काचा आहे.... मी तुमच्या रक्ताचा. तुमच्या सर्वस्वाचा आहे, तुमचे सुख तेच माझे सुख, तुमचे हित तेच माझे हित. तुमची गरज तीच माझी गरज, तुमचे दुःख तेच माझे दुःख, तुमच्या अडचणी त्याच माझ्या अडचणी, असा तुमचा माझा एकजीव आहे.... मराठ्यांची मते मराठ्यासच मिळाली पाहिजेत."
निवडणुकीबद्दल प्रबोधनात मी कोणाच्याही बाजूने एक अक्षरही छापणार नाही, असा स्पष्ट खुलासा मी केला होता. छापखाना कूपरचा असला, तरी त्याच्याविषयीही काही लिहिणार नाही. पण हे पत्रक हाती पडताच मात्र त्यातल्या जातिवर्चस्वाच्या तपशीलाने माझे डोके भडकले. बामणेतर पक्ष म्हणजे जातपाततोडक अभेद भावनेने यच्चयावत बहुजन समाजाचा उद्धार करायला निघालेला. म्हणूनच माझ्यासारखे काहीजण म्हणजे बहुजनांच्या एकाही अवस्थेच्या कोटीत केव्हाही न बसणारे मध्यमवर्गीय पांढरपेशे, बहुजन समाजाच्या सर्वांगीण उद्धाराच्या विशुद्ध हेतूने, या चळवळीत स्वजातीयांचा रोष पत्करूनही कार्य करीत होते. पण जाधवराव तर मराठ्यांची मते मराठ्यालाच मिळाली पाहिजेत, असा जोरदार प्रचार करीत सुटले.
सत्यशोधक म्हणून मिरविणाऱ्या तरी ते खचित शोमत नव्हते. मराठ्यांची मते जर मराठ्यालाच मिळावी, तर अस्पृश्यांनी तरी आपली मते मराठ्याला कां द्यावी? हा सरळ सवाल होत होता. युद्धात नि प्रेमात सर्व काही चालते खपते, हे सुभाषित कितीही खरे असले, तरी असल्या प्रचाराने बहुजन समाजाच्या एकमुखी संघटनेवरच फार मोठा आघात होणार होता. मी ते पत्रक दि. १६-१२-२३ च्या प्रबोधनात छापून "मेहरबान, ही वारंवार पगड फिरविण्याची सवय सोडून द्या. असले पगड़ी पटाईत पठ्ठे पुढारीच ब्राह्मणेतर संघाच्या नशिबाला लागल्यामुळे, त्या संघटनेचा रोजवारा उडाला आहे आणि गरीब बिचारी भोळी जनता तोंडघशी पडली आहे." एवढीच टीका केली.
अस्पृश्यांनी, स्पृश्यांपासून सावध रहा
सातारा जिल्हा बहुतांशी मराठ्यांचा असला, तरी निवडणुकांच्या हंगामात अस्पृश्यांच्याही भरघोस मतदानाचा बामणेतरी उमेदवारांना पाठिंबा शोधल्याशिवाय गत्यंतर नव्हते. निवडणुकीच्या हंगामापुरता त्यांना त्यांचा कळवळा फुटायचा. अस्पृश्योद्धारक परिषदांचा त्याच वेळी सुळसुळाट व्हायचा मी हा सर्व देखावा पहात होतो. वयाच्या ८व्या वर्षापासून अस्पृश्यतेला थोतांड मानण्याची शिकवण मला माझ्या आजीने दिलेली. तेव्हापासून या क्षणापर्यंत अस्पृश्यांच्या उठावाची संधी सापडेल तेथे मी यथामति यथाशक्ती यत्न करीत आलेला त्यांना कामापुरते मामा बनविण्याची बामणेतरी हातोटी मला साफ नापसंत होती. म्हणून दि. १६-१२-१९२४ च्या प्रबोधनात `अस्पृश्यांनो, स्पृश्यांपासून सावध रहा` या याचा एक लेख मी दणकावून छापला. तत्पूर्वी उरुण-इस्लामपूरचे माजी महार- कौन्सिलर कै. ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांना मी छापखान्याचे मॅनेजर नेमले होते आणि व्ह. फा. पर्यंत शिकलेले ५-६ महार तरुण छापखान्यात नोकरीला ठेवलेले होते. त्या देखाव्याला उद्देशून एकदा कूपर हसत उद्गारला "आमच्या अण्णासाहेबांचा (म्हणजे माझा) छापखाना आता अगदी महारवाडा बनला आहे."
तो लेख बाहेर पडताच कूपर, जाधवराव आणि आचरेकर तिघेही गडबडले आणि "अहो ही काय भानगड करून ठेवलीत? म्हणून तणतणत मला भेटायला आले. अंक बाहेरगावी जाताच, ७-८ खेड्यांतले जबाबदार अस्पृश्य नेते बरोबर ५-२५ मंडळी घेऊन छापखान्यात मला भेटायला आले. खूप चर्चा झाली." तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवू नका. येडपटांनो, तुमच्या भाग्याने तुम्हांला डॉ. आंबेडकरांसारखा तरणाजवान तुमच्या हाडारक्तामांसाचा पुढारी लाभला असताना, तुम्ही आमच्यासारख्यांच्या मागे कां लागावे? अहो, मेंढ्यांचा पुढारी दाढीवाला बोकड असावा. लांडगा चालेल काय? त्या आंबेडकराला जाऊन भेटा. तोच तुमचे कल्याण करणार. बाकीचे आम्ही सारे बाजूचे पोहणारे. समजलात? जा आता." असा स्पष्ट इषारा देऊन त्यांना घालवले. या माझ्या करणीमुळे, कूपरने मनोमन गाठ मारली की हा ठाकरे आपल्या पचनी पडण्यासारखा नाही.
इलेक्शन गौडबंगाली मौजा
जसं दिसतं तसं नसतं म्हणून माणूस फसतं. निवडणुका जिंकण्यासाठी कोण काय करील नि काय नाही, याचा धरबंदच नसतो. इरेला पेटला का संभावीतही आपला संभावीतपणा नि सचोटी लिलावाला काढतो. मग जात्याच जे संभावीतपणाला पारखे, ते काय अनाचार करणार नाहीत? जाधवराव, आचरेकरांच्या अस्सल कमस्सलत्वाच्या कोंबडाझुंजा गावोगाव अगदी वर्दळीवर चालू असतानाच, कूपरने मात्र मतदार गठवण्याचा आपला न्याराच रस्ता काढला. चेहरा म्हणजे हृदयाची तबकडी, असे म्हणतात, पण कूपरच्या बाबतीत हा आडाखा साफ निराळा होता. चेहऱ्यावर अखंड स्मितहास्यः समोर कोणी किती का तावातावाने आरडाओरडा करो, हा पठ्ठ्या सारखा हसत असायचा. समोरच्याचा संताप संपला का त्याच्या खांद्यावर हात ठेवून, कूपर अगदी मोजक्या शब्दांत आणि तोही हसत हसत, त्याला असा काही गारेगार करून रवाना करायचा, की शेण खाल्ले नि कशाला मी या भल्या माणसाशी होड घेतली, असे त्याला वाटायचे. कूपर बोलू लागला का त्याच्या तोंडात साखरेची गिरणी आहे की काय, असा अनुभव येत असे.
त्या निवडणुकीत व्याख्यानबाजीवर बिलकूल भर न देता, कूपरने एक निराळाच मार्ग काढला. सारा सातारा जिल्हा त्याच्या दाट परिचयाचा. लहान थोर सारे त्याच्या निकट परिचयाचे आणि ओशाळेही. जिल्हाभरची दारू विक्रीची दुकाने निरनिराळ्या नावांची असली, तरी त्यांचा मध्यवर्ती सूत्रधार कूपरच. त्याचे ठिकठिकाणचे स्नेही नि सहाय्यक कट्टर इमानदार. कूपरची हरएक योजना कुडाच्या कारवीला न कळता बिनबोभाट पार पाडणारे. महत्त्वाच्या केंद्राकेंद्राच्या ठिकाणी आजूबाजूच्या १५-२० खेड्यांतल्या वजनदार खेडूत नेत्यांना ते सहाय्यक आपापल्या घरी मेजवानीला बोलवायचे. दारू मटनाचा चमचमीत बेत. पंगती बसण्यापूर्वी पीत्वा पीत्वा होऊन, मंडळी पानांवर समताहेत, तोच अचानक अकल्पित (हे सारे आधी ठरलेलेच असायचे) कूपर साहेबांच्या मोटारीचा कर्णा ऐकू यायचा. "अरेच्या! खानबहादुर आले, अलभ्य लाभ" असा गलका व्हायचा, नेता खानबहादुरांना सामोरा जायचा. "वाहवा वाहवा, भाग्य आमचे" वगैरे हस्तिदंती करायचा. खानबहादुरांचे स्पेशल पान वाढण्याची गडबड (तीही अगोदर ठरलेली असायची) चाललेली पहाताच स्वारी म्हणायची, "छे छे पाटील, अहो हे आमचे सारे भाईबंद बसले आहेत, त्यांच्याच पंगतीला मी बसणार." लगेच पंगतीत एखादे पान रिकामे असेल तेथे कूपर जाऊन बसायचा.
पुंडलीक वरदा हारी इठ्ठल गर्जनेत भोजन चालू व्हायचे. मुख्य पक्वान्नाबरोबर तीर्थप्राशनही चालू असायचे. कूपर मात्र स्पर्शही करायचा नाही. जेवण अर्ध्यावर आले. भोजक मंडळींची तार पंचमावर चढली, म्हणजे यजमान पाटील पंगतीमध्ये उभे राहून `संभाक्षिण` करायचे. "मित्र हो. खानबहादुर येत्या विलक्षनात हुबं हायीत. त्येनी समद्या जिल्ल्यासाठी लोखंडी नांगराचा कारखाना काढलाय. शेतकऱ्यांच्या हितासाठी, अगदी सवस्त्यात. तवा आज आपून समद्यांनी समूरच्या भाकरीवर हात ठेवून, आपल्या समद्या गावची मतं फकस्त खानबहाद्दुरांनाच देनार, अशा शपता घेतल्या पाहिजेत." भराभर सारी मंडळी शपथा घ्यायची. हे एवढे काम झाले का खानबहाद्दुराची मोटार निसटलीच दुसऱ्या ठिकाणच्या तसल्याच कार्यक्रमाला. ही हकिकत मी स्वानुभवाने लिहीत आहे. कारण त्या बड्या गाड्याबरोबर या छोट्या नळ्याचीही यात्रा जागोजाग होत असे.
निवडणुकीत जाधवराव आणि कूपर निवडून आले आणि बिचारा आचरेकर कोसळला! आचरेकर सातारचा एक बहुश्रुत तल्लख विद्वान वकील होता. २३च्या निवडणुकीत त्याला कोल्हापुरच्या पिशवीचा उबारा लाभला होता. या पराभवामुळे सातारी बामणेतरी पुढाऱ्यांबद्दल कोल्हापूरकर श्रेष्ठी भयंकर रुष्ट झाले. निवडणुकांचा एवढा मोठा गदारोळ चालला असताही, भाऊराव पाटील मात्र अगदी नामानिराळा राहिला, कोठे व्याख्यानाला गेला नाही का मतदार मथवायला गेला नाही. तसल्या पण्टरगिरीचा तो तिरस्कारच करायचा. त्याने आपले सारे लक्ष कारखान्यातून तयार होणाऱ्या मालावर आणि एजंटाना जमविण्यावर केंद्रित केलेले होते. कारखान्याचा माल सपाटून विकला गेला नि भरघोस नफा झाला, तर त्यातल्या काही टक्क्यांवर त्याला आपली मागास विद्यार्थ्यांच्या बोर्डिंगाची योजना तडीला न्यायची होती. त्याच्या प्रचारासाठी त्याने साप्ताहिक कुऱ्हाड नावाचे पत्रही काढण्याच्या जाहिराती फैलावल्या होत्या, पण तो बेत काही कारणांमुळे फलद्रूप झाला नाही.
निवडणुकीतल्या `पण्टर` प्राण्याची ओळख
मुंबईबाहेर पडल्यामुळेच मला या नवीन पण्टर प्राण्यांची ओळख झाली. सुरवंटाप्रमाणे हा प्राणी फक्त निरनिराळ्या निवडणुकांच्या हंगामात जन्माला येतो. पितरपाखाची खीर खाऊन सुरवंट नाहीसा होतो, तसा हा पण्टर प्राणी निरनिराळ्या उमेदवारांच्या थैल्या आरपार घाटून आपले घर भरल्यावरच भूमिगत होतो, किंवा अहम् विशेषोऽस्मि थाटाने समाजात मिरवितो. कूपरच्या पाडळीच्या एका पण्टराने मला दीडशे रुपयांच्या खाड्यात अलगद नेऊन गाडले उमेदवाराला कसकसल्या थापा देऊन पण्टर लोक बनवितात, याची अनेक उदाहरणे मी पाहिलेली आहेत.
कूपर-पाटलाचा पहिला खटका
कारखान्यात नांगराचा साठा तयार झाला. गावोगावचे अनेक एजंट कारखान्यात येऊन बसले. नांगराची किंमत किती, या आकड्यावर गाडे थोपले होते. किर्लोस्कर त्यावेळेपावेतो १००-१२५ ला एकेक नागर विकित असत. बरे. प्रत्येक नांगराची निर्मिती-किंमत किती? आकडेमोड केल्यावर ती अवधी रु.१२.५० होत होती. असला नांगर काय कूपरनेही किर्लोस्करांप्रमाणे १००-१२५ ला विकायचा? मग शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून पिटलेल्या डांगोऱ्याचे काय? भाउराव पाटलांचे म्हणणे निर्मिती-किंमतीच्या तिप्पट किंमतीने नांगर विकावा. कूपर म्हणे, "मग एवढा मोठा कारखाना आम्ही काढला कशाला? एकाचे हजार होत नाही. तो धंदा करायचा तरी कशाला? कूपरची नांगराची किंमत जाहीर होईपर्यंत किर्लोस्कर आपले किंमतपत्रक बाहेर काढीत ना, आणि त्यांचे पत्रक निघेपर्यंत कूपरला आपले पत्रक काढण्याची छाती होईना.
एक आठवडाभर अक्षरशः रात्र न दिवस कूपर नि त्याचे भागीदार आणि एका बाजूला एकटा भाऊराव पाटील यांच्यात जोरजोराची खडाजंगी चालू होती. गावोगावाचे आलेले एजंट हा तमाशा पहात होते, ऐकत होते. अखेर नांगराची किंमत ३६ रु. ठरून, त्याप्रमाणे जाहीर पत्रके निघाली, किर्लोस्करांनाही अखेर आपल्या नांगराची किंमत १००-१२५ वरून ३६ वर आणणे भाग पडले. तेव्हापासून मात्र भाऊराव पाटील ही आपल्या मार्गातली एक खट्याळ अडचण आहे, ही कूपरने आपल्या मनोमन खूणगाठ बांधली. तशातच मी आणि भाऊराव सदासर्वकाळ एकत्र आणि माझा विचार घेतल्याशिवाय तो पुढे कसलेही पाऊल टाकीत नसल्यामुळे, पाटील ठाकरे जोडी म्हणजे आपणहून गळ्यात बांधलेली धोंड, असे कूपरला वाटणे सहाजिक होते.
असे जवळच वहात असलेल्या पाटातले पाणी हातात घेऊन शपथ घेतल्यासारखे त्याने केले. नंतर भाऊरावविषयी अनेक खऱ्याखोट्या गोष्टींनी माझे मन दूषित करून, मी त्याच्या संसर्गापासून दूर रहावे. असा आग्रह चालविला. भाऊरावला उखडण्याच्या योजनेचेही धागेदोरे त्याने मला सांगितले. फक्त मी त्याला कसल्याही अवस्थेत पाठिंबा न देण्याची शपथ घ्यावी. म्हणजे झाले. "विचार करून काय ते सांगतो, उद्या आपण पुन्हा भेटू" अशा आश्वासनावर मी ती कटबाज मुलाखत आटोपती घेतली.
बांधा रे या मोकळ्या जागेवर
भाऊरावाचे बोर्डींग. कूपरची कारखान्याला आरडर सुटली. कारण, नांगरांची विक्री सपाटेबंद चालू झाली. तेव्हा भाऊरावाने बोर्डींगचे काय करता, असा तडाखेबंद आग्रह धरला. त्यावर ही आरडर सुटली. कारखान्यातली कोणतीही तथाकथित `इमारत` म्हणजे भराभर खांब पुरायचे आणि वर पत्रे चढवायचे. जमीन थोडीशी कुदळून चोपली का बिल्डिंग तयार. बोर्डींगसाठी छपरासकट इमारत तयार झाली, पण पत्र्याऐवजी बांबूच्या तट्ट्यांचा कुडावा तयार केला. त्या इमारतीचा उद्घाटन विधी होण्यापूर्वीच, आजूबाजूच्या उनाड ढोरांनी त्यात शिंगे भोसकून वाताहत केली. खांबांना दुश्या देऊन ते वाकडे केले. मग हो काय, छपरांचे पत्रे अक्षरशः जमीनदोस्त झाले! हे पहाताच भाऊराव मनस्वी गरम झाला आणि कूपरने आपली थट्टा चालविली आहे, हे बिनचूक हेरून, त्याने मोठा कडाक्याचा तंटा केला. असे अनेक प्रसंग उद्भवत गेले आणि अखेर भाऊराय नि कूपर यांची परस्परांची मने आरपार गढूळ होत चालली.
ठाकरेला आपल्या कच्छपी चिकटवला तर?
दादरचा थाटलेला संसार आणि व्यवहार मोडून मी कूपरच्या सहकारात तथाकथित उज्वल भविष्याचा शोध घ्यायला हुरळून पाडळीला आलेला. येथून गेलो अथवा घालवले, तर पाय टेकायला मला जागाच नव्हती, हे पुरेपूर हेरून, कूपरने भाऊरावविरुद्ध मला गठवण्याची एक गुप्त योजना आखली. एक दिवस अगदी सकाळीच मला सातारला येण्याबद्दल आपली गाडी पाठविली. अर्जंट काम आहे. ताबडतोब यावे, असा निरोप. मला त्याने त्याच्या फळबागेत नेले. मला खूप उंचशा हरभऱ्याच्या झाडावर चढविले. आपला परस्परांचा ऋणानुबंध आमरणच काय पण वंशपरंपरेने ठिकावा ही माझी इच्छा.
प्रकरण १४
डिवचलेला भुजंग चवताळला
फळबागेतली भेट संपवून मी परत येताच. भाऊरावला रेल्वे लायनीवर फिरायला घेऊन गेलो आणि घडलेली सगळी हकिकत त्याला सांगितली. "हे असे होणारच. याची मला कल्पना होतीच." भाऊराव सांगू लागला "कारण, गेला पंधरवडाभर किर्लोस्करातून माझ्याबरोबर आलेल्या प्रत्येक इसमालाही माझ्याविरुद्ध चेतवण्याचा कूपरचा खटाटोप कसा चालला आहे, हे त्या लोकांनीच माझ्या कानांवर वेळोवेळी घातलेले आहे मी तसा सुकासुकी जाणारा माणूस नाही त्याच्या पाठीचे हातभर सालटे सोलून मगच जाईन." एक घाव दोन तुकडे करण्याचा माझा स्वभाव त्याला माहीत असल्यामुळे, त्याने मला तुम्ही मात्र आत्ताच त्याला दुखवू नका. होय होयवर टांगता ठेवा." अशी आग्रहाची सूचना केली.
मला विवेक शिकवला. पण त्या रात्री भाऊराव एकटाच कारखान्याभोवती रात्रभर प्रदक्षणा घालत जागता राहिला. पहारेकऱ्याने सहज विचारले, "तर झोप येत नाही" अशी सबब सांगितली.
तो भयंकर प्रसंग
मी त्यावेळी होतो सूर्यवंशी, रात्रभर जागरण व्हायचे छापखान्यात. तेव्हा सकाळी आठ वाजता उठायचा. उठून चहा पीत होतो. इतक्यात भाऊरावची बायको धावत ओरडत माझ्या तंबूवर आली. "दादा धावा हे बंदूक भरून कूपरला ठार मारायला धावले बघा लवकर जा, लवकर जा" मी तसाच झपाट्याने छापखान्याच्या बाजूला धावत गेलो. कूपर गाडीतून उतरत होता आणि भाऊराव चवताळलेल्या नागासारखा फूत्कार टाकीत त्याच्या रोखाने बंदूक सरसावून चालला होता. धापा टाकीत मी भाऊरावला गाठला कूपर हे पहात होता आणि हसत आस्ते आस्ते त्याच्या नजरेला नजर भिडवून येत होता.
झडप घालून मी भाऊरावच्या हातातली रायफल हिसकली आणि दूर भिरकावून दिली. जवळच उभा असलेल्या कोणाला तरी मी "जा नेऊन ठेवा ती माझ्या तंबूत" असे दरडावून सांगितले. इतक्यात बरीच मंडळी तेथे जमली. आणि आम्ही सगळ्यांनी बेमान झालेल्या भाऊराव पाटलाला कसेबसे त्याच्या झोपडीत नेऊन बसवले. "आज पाळी टळली. पण याला खतम् केल्याशिवाय मी रहाणार नाही" वगैरे संतापी बडबड तो काही वेळ करीत होता. अशी तंबी देऊन ठेवला. पुस्तके वाचायला दिली. दोन दिवसांनंतर तो आपल्या गावी (ऐतवडयाला) आपल्या मातापितरांना भेटायला गेला आणि आठवड्याने शांतचित्त होऊन परत आला.
भाऊरावची जाहीर कबुली
सन १९४५ च्या सप्टेंबरात दादर येथे माझ्या एकषष्टीचा जाहीर समारंभ झाला. त्यावेळी भाऊराव मुद्दाम साताऱ्याहून आला होता. दि. १४-१-४६ च्या समारंभाच्या माहितीपत्रकात सत्कारानिमित्त आलेल्या वृत्तपत्रातील. बाहेरगावाहून आलेल्या थोर थोर लोकांच्या अभिनंदन पत्रातील उतारे आणि समारंभात झालेल्या भाषणांची त्रोटक माहिती छापलेली माझ्या संग्रही आहे. त्यात भाऊरावच्या भाषणाचा एक उतारा असा छापलेला आहेः
"माझ्या शिक्षणप्रसाराच्या कार्याचा अखिल हिंदुस्थानात आज मोठा बोलबाला होऊन राहिला आहे. पण आज मी एक गुपित बाहेर फोडतो. रयत शिक्षणाची कल्पना माझी असली तरी त्या बीजाला चैतन्याचे, स्पूर्वीचे नि उत्साहाचे पाणी घालून त्याला अंकुर फोडणारे आणि सुरवातीच्या संकटांच्या प्रसंगी धीर देऊन, विरोधाचे पर्वत तुडविण्याचा मार्ग दाखविणारे माझे गुरू फक्त प्रबोधनकार ठाकरे. ते माझे गुरू तर खरेच, पण मी त्यांना वडिलांप्रमाणे पूज्य माझ्या पूजनीय मानतो. कां मानू नये मी? एका प्रसंगी निराशेच्या नि संतापाच्या भरात नी हातून खून होणार होता. चित्त्यासारखी उडी घेऊन ठाकऱ्यांनी माझ्या हातची बंदूक हिसकावून घेऊन माझे माथे ठिकाणावर आणले नसते, तर कुठे होता आज भाऊराव आणि त्याच्या कार्याचा पसारा?
ठाकरे मुंबईला रहात असले तरी मुंबई ही त्यांची कर्मभूमी नाही त्यांची कर्मभूमी सातारा जिल्हा आज सातारा जिल्ह्याची वाघाची डरकाळी तमाम हिंदुस्थानाला हालवीत आहे. पण हा भाऊराव पाटील छातीला हात लावून सांगत आहे, साताऱ्याच्या आजच्या या जागृतीचा पाया २५ वर्षांपूर्वी ठाकऱ्यांच्या मुलुख मैदानी व्याख्यानांनी घातलेला आहे. हे ठाकरे विसरले तरी सातारा जिल्हा विसरणार नाही. प्रतापसिंह छत्रपती नि रंगो बापूजी यांच्या दुर्दैवी कहाणीची ठाकऱ्यांची दणदणीत व्याख्याने सातारकर शेतकऱ्यांच्या कानांत अजून घुमत आहेत आजच्या तरुण पिढीला ठाकऱ्यांचे लेख पूर्वी इतक्याच जाज्वल्य तडफेने मागदर्शन करतील, असे मी खात्रीने सांगतो."
नंतर कूपरबरोबर समेट झाला आणि झाल्या गेल्या गोष्टी सर्वांनी विसरून एकोप्याने रहावे, असा तहनामा ठरला. विसरा म्हणून सांगणे सोपे असते. पण जिवाग्री लागलेल्या जखमा सहसा कोणी विसरतच नाही. कूपरी कारवायांचे बातबेत पुढे दाट बुरख्यातूनच होऊ लागले. त्याचे भागीदार दोन. एक रहिमतपूरचे खान बहादुर इसूफभाई आणि कारखान्यातच ठाण मांडून बसलेले पापामिया. पैकी इसूफभाई कधीमधी येऊन जायचे. माणूस मनाचा थोर आणि मोकळा. आत एक बाहेर एक त्याला जमायचेच नाही. याच्या उलट पापामिया वरवर हसून आतून कोणत्या वेळी काय कड्याळ उठवील याचा नेम सांगता यायचा नाही. पुराव्याला हाक मारली तर चक्क कानांवर हात ठेवून मोकळाही व्हायचा. या पुढची पायरी म्हणजे भाऊरावचा सूत्रधार जो ठाकरे त्याला येनकेन प्रकारेण हाकलायचा. तो गेला म्हणजे या रानगट्ट्या पाटलाचे पहाता येईल. हा गुप्त डाव चालू झाला. त्याची हकिकत सांगण्यापूर्वी पार्श्वभागाची घटना सांगितली पाहिजे.
बापूसाहेब चित्रे यांचा निष्ठावंत सत्कार
दादरच्या स्वाध्यायाश्रमात प्रबोधन च्या कार्याला ज्यांचा कट्टर निष्ठेचा सहकार लाभत असे. ते कै. रामचंद्र वामन उर्फ बापूसाहेब चित्रे त्यावेळी पुण्याला रहात असत. प्रबोधनाच्या दर पंधरवडयाच्या अंक-प्रसिद्धीसाठी महिन्यातून दोन वेळा बिनचूक सातारा रोडला यायचे. प्रुफे तपासणी, मेकअप, काही मजकूर स्वतः लिहिणे वगैरे कामे करून परत जायचे. त्यांच्या बरोबर प्रो. दिनकरराव समर्थही कधीमधी यायचे. मी. प्रो. समर्थ, बापूसाहेब, दत्तोपंत देशमुख, कद्रेकर आणि भाऊराव पाटील हा आमचा पाडळीचा `ठाकरे कम्पू.`
पुण्याच्या भामट्याने बापूसाहेबांना बनवले
बापूसाहेबाचा सेकण्ड एलेल्बीचा एकच पेपर राहिलेला होता. बंगाली भाषेचा त्यांचा अभ्यास चांगला असे. त्यांचे अनेक मराठी लेख अनेक वृत्तपत्रात अधूनमधून येत असत. प्रो. माट्यांच्या अस्पृश्योध्दारक हालचालीत बापूसाहेब नेहमी भाग घेत असत. पाटण्याचे बॅरिस्टर एस. जी. मुकर्जी यांच्याकडून त्यांच्या `डिक्लाइन अॅण्ड फॉल ऑफ हिंदूज` या इंग्रेजी पुस्तकाचे मराठी भाषांतर करण्याचे हक्क मी मिळविल्यावर, त्याचे मराठी भाषांतर करण्याचे काम मी बापूसाहेबावर सोपवले आणि त्यांनी ते बरेचसे केले. माणूस मनाचा फार सरळ. छक्केपंजे विचाऱ्याच्या स्वप्नीही नसायचे. पुण्यात त्यांच्या ओळखी सर्वत्र.
दिल्लीला सोदे आणि पुण्याला भामटे, अशी एक जुन्या ख्यातीची म्हणच आहे. तसा एक भामटा छापखानेवाला भट बापूसाहेबांना भेटला त्याच्या छापखान्यावर डोईजड कर्ज झालेले होते. बहुतेक सावकारानी त्याच्या विरुद्ध डिकऱ्या मिळविल्या होत्या. केव्हा टाच येईल नि छापखाना जप्त होईल, याचा नेम नव्हता. हेच त्याच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन होते. सावकरांना धाब्यावर बसवून छापखाना वाचवायचा तर तो जंगम माल असल्यामुळे तात्पुरता कोणाच्याही नावाने नाव बदलून चालू ठेवला का काम भागत होते. हनुमान छापखान्याचे नाव द्रोणागिरी छापखाना असे बदलले का सावकार बसले हात चोळीत. असा व्यूह रचून त्या भामट्याने बापूसाहेबाना तो छापखाना घेण्याची गळ घातली. नाव बदला, तसे डिक्लेरेशन करा, नवी पाटी लावा. मी छापखान्याशेजारीच आहे (मोरोबादादाच्या वाड्यात), जे काही नक्की उत्पन्न येत जाईल, त्यातले १२ आणे तुमचे ४ आणे माझे सर्व व्यवहार गुपचीप, "मला स्वतःला हा धंदा चालवता येणार नाही, पण आपण सातारा रोडला जाऊन ठाकरे यांना विचारू, त्याचे वृत्तपत्र आहे व ते ग्रंथप्रकाशकही आहेत. जमले तर जमले", असे सांगून बापूसाहेब त्या गायतोंड्या भटाला घेऊन एका खेपेला पाडळीला आहे.
काय योगायोग पहा! तो प्राणी माझ्या भेटीला आला. त्याच वेळेला माझी सहा महिन्यांची एक मुलगी समर डायरियाने तडकाफडकी मृत्यू पावली. भवितव्याच्या छाया आधीच पडत असतात. म्हणतात. तोच अनुभव या पुणेरी भामट्याच्या जंजाळात अडकून मला भोगावा लागला.
मिळतो आहे तर घ्यावा
"छापखाना चालू आहे. कामे तर नेहमी येतच असतात. कम्युनिस्ट निंबकरांचा साप्ताहिक `स्वदेशी` माझ्याकडेच छापला जात असतो. छापखाना सर्व साहित्याने सज्ज आहे. चार-सहा महिने चालवून पहा, तेवढ्यापुरती माझ्या घरखर्चाची व्यवस्था मी केलेली आहे, धंद्यात जसा हात चालेल तसे दर महिना माझ्या संसारखर्चाला थोडेफार देत जा, म्हणजे झाले. भाड्याविषयी मी वाड्याच्या मालकाची समजूत घातली आहे. ते तुम्हाला तुमच्या नावाने बिनशर्थ पावती देत जातील." असा विचार त्या कारवाईखोर भटाने आमच्यापुढे मांडला. भाऊराव पाटील, बापूसाहेब प्रो. समर्थ आदी सहकारी मंडळींनी त्यावर दोन दिवस खल करून, `काही हरकत नाही` असा सल्ला दिला. भाऊराव म्हणाला "एवीतेवी आज ना उद्या तुम्हाला सातारा रोड सोडावाच लागणार. जी तुमची वाट तीच माझी तेव्हा छापखान्यासारखे प्रचाराचे हुकमी साधन आपणहून चालत आले आहे. ते सोडू नका." अखेर, बापूसाहेब चित्र्यांनी पुण्याचा छापखाना ताब्यात घ्यावा, नव्याने डिक्लेरेशन करावे आणि काही दिवस तो स्वतः चालवावा, असे ठरले आणि त्याप्रमाणे त्यांनी `प्रबोधन छापखाना` नावाने मुद्रक म्हणून डिक्लेरेशनही केले. साहजिकच मी तशी जाहिरातही प्रबोधनच्या पुढच्या अंकात छापली.
कारस्थान्यांना कारण मिळाले
अंक बाहेर पडल्यावर कूपर हसत हसत म्हणाला "काय अण्णासाहेब, पुण्याला म्हणे तुम्ही छापखाना काढला?" मी होय. एक विकाऊ मिळाला. तो बापूसाहेब चित्रे यांनी माझ्यासाठी घेतला. कूपर होय होय, त्यांनाही या धंद्याची फार आवड आहे. हिमती लेखकांना छापखाना तर अगत्य हवाच.
किन्हईचे माझे जानी दोस्त
पाडळीला जाताच तेथून जवळच असलेल्या किन्हई गावातील दोघा मित्रांचा स्नेह मला लाभला. पहिले पंत पराडकर हे तर माझे जुनेच जिव्हाळ्याचे दोस्त होते. त्यांनीच माझ्या `वक्तृत्वशास्त्र` ग्रंथाच्या प्रकाशनाची सोय श्री. दत्तोपंत पोतदारांच्या मार्फत चित्रशाळेकडे केलेली होती. त्यावेळी ते किन्हई येथे उदबत्त्यांचा कारखाना चालवित होते. दुसरे डॉ. पाटणकर `सुवर्णराज वंगेश्वर` या औषधाच्या जाहिरातीने त्यांचे नाव महाराष्ट्रभर त्याकाळी महशूर झालेले होते. रोज शेकडो पार्सले सर्वत्र रवाना होत असत. हे दोघेजण एक दोन दिवसाआड किन्हईहून येऊन भेटले नाहीत असा आठवडा गेला नाही. त्यांचेही बारीक लक्ष कुपरी भानगडीवर फार असे आणि वरचेवर ते मला सूचनाही देत असत. छापखान्याच्या प्रकरणात त्यांचाही सल्ला मी घेतला होता.
पापामियाने रंजूक शिलगावली
साताराच्या छापखान्यातील माल गुपचीप नेऊन, ठाकरे साहेबांनी पुण्याला छापखाना काढला. ही कुटाळकी पापामियाने दिली हवेत भिरकावून मग हो काय? ज्याच्या त्याच्या तोंडी कुजबूज होऊ लागली. माझ्या कानी येताच, मी कूपरला त्याचा जाब विचारला. "तो कसला वस्ताद त्याने असे शक्य तरी आहे काय? छापखान्यातला माल म्हणजे काय कार्ड पाकीट आहे. का टाकले पोष्टात नि झाले रवाना? मूर्ख आहेत असे बोलणारे, तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका" असा नेहमीच्या साखरी थाटात इन्कार केला.
मला मात्र त्या कुटाळकीने भयंकर जखमी केले. एक सामान्य माणूस म्हणून माझ्या विचारात काहीही दोष असले, तरी चोरी, चहाडी नि शिंदळकी या तीन पातकांपासून मी या क्षणापर्यंत तरी कसोशीने अलिप्त राहिलो आहे. ताबडतोब त्याच रात्री बंगलोर मेलने कुटुंबाची रवानगी दादरला केली. पंत पराडकर आणि डॉ. पाटणकर यांना बोलावून घेतले. चार दिवस आणि रात्र तिघांनी श्रमून छापखान्यातील यच्चयावत लहान मोठ्या साहित्याची इन्व्हेंटरी तयार केली. त्याच सुमाराला कोरेगावचे मामलतदार कै. रावबहादूर दुधुस्कर फिरतीवर पाडळीला आले होते. "आपण एक दिवस मुक्काम वाढवा, आपल्या समक्ष छापखान्याच्या साहित्याची खरेदीपत्रके आणि आता तयार केलेली इन्व्हेंटरी यांचा ताळमेळ घालून मला उद्या सकाळीच छापखाना कूपरच्या ताब्यात देऊन येथून कायमचे जायचे आहे." अशी मी त्यांना विनंती केली. रा. ब. दुधुस्कर यांचा नि माझा परिचय माझ्या वयाच्या १५ व्या वर्षापासूनच होता. मला नि माझ्या घराण्याला ते पनवेलीपासून चांगले ओळखत होते. मी का जात आहे. याचा सर्व इतिहास त्यांना सांगितला नि त्यांनीही "तुमच्यासारख्या निस्पृहाने असेच केले पाहिजे. येथल्या भांडवलदारीच्या खतात तुमच्या लोकसेवेचा वृक्ष साफ करपून जाईल." असा स्पष्ट अभिप्राय दिला. "उदईक सकाळी ८ वाजता येऊन आपण आपल्या छापखान्याचा चार्ज घ्यावा, असे होईपर्यंत मी कारखान्याच्या हद्दीत पाण्याचा घोटही घेणार नाही." अशी चिठ्ठी कूपरला पाठवून दिली.
कूपरी जंजाळातून मुक्तता
ठरल्याप्रमाणे कूपर आला प्रारंभी काही मायाची बोलणी झाली. नंतर ८ ते ११ वाजेपर्यंत रा. ब. दुधुस्करांच्या समक्ष इन्हेंटरीप्रमाणे प्रत्येक वस्तू कूपरला दाखवून, त्याची तेथे इनिशियल्स घेण्याचा क्रम चालला. पंत आणि पाटणकर मला सहाय्य करीत होते. अखेर माझी कपडयाची बॅग उघडून त्यातही काही चोरीचा माल जात आहे की काय ते पहा. म्हणून उघडू लागलो. तोच कूपरने मला मिठी मारून म्हटले, "अण्णासाहेब, आपण जात असला तरी आपल्याबद्दलचा आदर माझ्या मनात चिरकाल राहील. आपल्यासारखा एक स्पष्टवक्ता दोस्त मी आज गमावत आहे. याचेच मला फार वाईट वाटत आहे."
कागदपत्रांवर आम्हा दोघांच्या सह्या आणि रा. ब. दुधुस्करांची साक्षीची सही झाल्यावर, कूपरने चहा मागवला. मी सांगितले, "खानबहादूर, आपल्या कारखान्याच्या हद्दीत मी पाण्याचा घोटही घेणार नाही, अशी माझी प्रतिज्ञा आहे. तेव्हा आग्रह करू नका. "मी. कद्रेकर, देशमुख आपल्या बॅगा उचलून, समोरच्या पोष्टात गेलो. मागोमाग भाऊरावही आला. तेथे जोशी मास्तरनी चहा तयारच ठेवला होता. तेथे आम्ही चहा प्यालो आणि काही वेळाने सातारला कै. नारायणराव वाळवेकर यांच्याकडे निघून गेलो.
ठाकरे.....आणि पुण्यात? अब्रह्मण्यम्!
बापूसाहेब चित्रे आणि प्रो. समर्थ यांनी माझ्या बिऱ्हाडासाठी सदाशिव पेठेत आमचा बालमित्र वासू नातू याच्या घरात जागा भाड्याने घेतली. साताऱ्याहून आम्ही पुण्यालाच आलो. ब्राह्मणेतर चळवळीतला एक नाठाळ लेखक नि वक्ता ठाकरे पुण्यासारख्या ब्राह्मणनगरात येऊन प्रकाशनाचे ठाण मांडतो म्हणजे काय? तशात एक जातिवंत ब्राह्मणच त्याला आपला छापखाना देतो किंवा विकतो. म्हणजे तरी काय? सारा चळवळ्या ब्राह्मणवर्ग माझ्या हालचालीवर काकदृष्टी ठेवून बसला. तोवर ब्राह्मणेतरी चळवळ पुण्यात चालायची म्हणजे कै. श्रीपतराव शिद्यांच्या साप्ताहिक विजयी मराठा आणि जेथे जवळकर यांच्या नव्या दमाच्या चळवळी, इतक्याच. तशात हा ठाकरे आता येथे आल्यावर मग हो काय? शुक्रवार पेठेला विशेष जोर चढणार!
तशात मी पुण्यात पाऊल ठेवताच केशवराव जेधे, जवळकर, राजभोज आणि विशेष म्हणजे श्रीधर टिळक इत्यादी मंडळींच्या बैठकी बहुतेक रोज माझ्या माडीवर होऊ लागल्यामुळे, तर त्यांच्या अंदाजाला विशेष पालवी फुटू लागल्यास नवल ते कसले? दूरवर असलेले पाप आता थेट घराच्या माजघरातच आल्यामुळे येनकेन प्रकारेण पुण्यातून माझी उचलबांगडी करण्याच्या खटपटीला चळवळ्या ब्राह्मणवर्ग लागला.
प्रथम त्यांनी घरमालक श्री. नातू यांच्यावर अनेक लोकांकडून वजन आणून मला नोटीस देण्याची कारवाई केली. पण नातूने स्पष्ट नकार दिला. शेजाऱ्याला चिथावून नातूला त्रास देण्याचा खटाटोप झाला, पण त्यालाही तो पुरुन उरला.
पुण्याला येताच मी छापखाना हातात घेतला आणि प्रबोधनचे १-२ अंक काढले. निंबकरांचा `स्वदेशी` छापला जाई. पण जुन्या मालकाच्या वहिवाटीप्रमाणे तो उधारीत चालू होता. बाकीही फेड होत नसे. मी आक्षेप घेतला. रोखीशिवाय छापणार नाही म्हणून. त्यांनी अंकच बंद ठेवला. उधारी गेली उडत. येथे जुन्या मालकाची पहिली कुरबूर चालू झाली कारण. उधारीवी बाकी तो परस्पर करीत असे आणि मी मात्र निंबकरापाशी माझ्या अमदानीतल्या छपाईचे काही घेऊ नये, असे त्याचे म्हणणे बरोबर होते ते कारण काम बंद झाल्यावर निंबकर कशाला देतो उरलेली बाकी? साधारण दीड महिना झाला असेल नसेल तोच, पुणेरी कारवाईखोरांनी छापखान्याच्या जुन्या मालकाला चिथावले. त्याच्या भोवती रोज रात्री खटपट्या ब्राह्मणांचा वेढा पडायचा.
"तू एखाद्या धेडाला छापखाना चालवायला दे, पण ठाकऱ्याच्या हातातून काढून घे." असा त्यांचा नेच्या चालू झाला. सरळ सरळ तर त्याला आता काही करताच येण्यासारखे नव्हते. त्याचा कसलाही हक्क मी जुमानला नसता तरी त्याला काहीही करता येण्यासारखे नव्हते. कारण कसलेच काही कागदपत्र झालेले नव्हते. मला अडचण एकच. छापखाना होता कुविख्यात मोरोबा दादाच्या वाड्यात. त्याचे मालक काय गडांतर आणतील, त्याचा नेम नव्हता. अखेर तेही आले. किती हिकमतीने आले, ते पहा.
बिऱ्हाडावर भिक्षुकांची टोळधाड
माझ्या हातून छापखाना कसा काढून घ्यायचा, याचे कारस्थान शिजवून तयार झाले. वास्तविक, मी काही त्या छापखान्याच्या मागे लागलेला नव्हतो. माझ्या गळ्यात बळेबळेच तो येऊन पडला होता. एक दिवस पहातो तो दोन प्रहरी अचानक १५-२० टापशीवाले मिक्षुक आणि तो पुणेरी कारस्थान्या माझ्या बिऱ्हाडी येऊन माडीवर बसले. "काय हो, ही एवढी मंडळी घेऊन कशाला आला?" मी त्या माजी मालकाला विचारले. प्रथम तो काहीच बोलेना. बराच वेळ मुग्धतेत गेल्यावर एकेका भटपोपटाला कण्ठ फुटू लागला. "सध्या खाबुरावांची उपासमार चालली आहे नि आपण तर त्यांना काहीच देत नाही.
निदान ३०० तरी रुपये आपण त्याना द्यावे." हा सगळ्या त्या भटी कावकावीचा मतितार्थ. सहा महिनेपर्यंत मी काही द्यायचे नाही, त्यांनी काही मागायचे नाही असा करार करूनच मी त्याला जप्तीच्या संकटातून वाचवायला छापखाना घेतला. आता ही नवी भाषा काय म्हणून? शिवाय मी काही मोठा भांडवलदार नाही, हेही त्याला माहीत आहे. बरे, छापखान्यातल्या कामाची बिले हा बाहेरच्या बाहेर स्वतः वसूल करीत असतो, अशा अवस्थेत याला मी द्यायचे तरी काय असे मी स्पष्ट बजावले, पण त्याचा कलकलाट सारखा चालूच राहिला. तासभर माझे नि बापूसाहेब चित्र्यांचे माथे पिचवल्यावर ती टोळधाड उठून गेली.
भटांनी रात्री टाळे फोडले
त्या रात्री १२ वाजल्यावर, मोरोबा दादाच्या वाड्यात ७-८ भट जमले, तेथेच नजीकच्या खोलीत छापखान्याचा फोरमन गुप्ते रहात असे. किल्ली त्याच्याजवळच असे, खाबूराव त्याच्याकडे ओरडत गेला. "अहो, छापखान्यात मागल्या बाजूने कोणीतरी शिरले आहे. टाळे खोला, दिवा लावा, आपण शोध घेऊ." गुप्त्याने टाळे उघडताच, सर्व मंडळी शोधाशोध करू लागली. टेबलावर टाळे नि किल्ल्या होत्या. त्या खाबूरावाने पळवल्या, बाकीच्यांनी छापखान्याची पाटी खाली काढून भटानी राकेल ओतून जाळली. गुप्त्याला धक्के मारून बाहेर काढले नि छापखान्याला निराळे टाळे लावून मंडळी पसार झाली.
गुप्ते माझ्याकडे ओरडत आला. बापूसाहेबांना बोलावले. ते तसेच तडक काका गाडगिळांकडे गेले. काकांचा नि त्यांचा स्नेह, तशात ते नव्या उमेदीचे वकील. "अहो, तो खाबू पक्का फोर-ट्वेण्टी तुम्ही कसे त्याच्या जाळयात सापडला?" काका म्हणाले. "माझ्याकडे त्या छापखान्याच्या चार जप्त्याची वारंटे आहेत. आत्ताच्या आत्ता चित्रशाळेच्या काकाकडे जा, नि त्यांना ही चिठ्ठी द्या. अहो आता इंद्राय तक्षकायच केले पाहिजे. बापूसाहेब काका जोश्यांना भेटले. सकाळी कोर्ट उघडताच काका जोश्यांनी जप्तीचे वारंट घेऊन, छापखान्याला बेलिफाकडून टाळे ठोकले. मागाहून धडाधड आणखी सावकारांच्या जप्त्यांची टाळी लागली. खाच्या बोंबलत माझ्याकडे आला. "आता कशाला शंख करतोस? सावकारांना बुडवून आणखी वर माझ्याही नरड्याला हात घालीत होतास ना? बस आता हात चोळीत." मी दरडावलो. पुढे त्या छापखान्याचा लिलाव झाला आणि तो जळगावच्या श्री सीताराम नाना चौधरींनी घेतला. त्यात अडकलेले माझे किरकोळ सामान त्यांनी मला परत केले.
माझा अहंकार दुखावला
वास्तवीक, पुण्यात व्यापार व्यवहार करण्याची कल्पनाही कधी मला शिवलेली नव्हती. पण अकल्प परिस्थितीने मला तेथे ओढून आणले. झाला व्यवहार तो अवघा महिना दीड महिन्याचा पण पुण्यातून प्रबोधनाचा काटा काढलाच की नाही, ही घमेंड पुणेरी कारवाईखोर भटाना पचू द्यायची नाही, असा मी निर्धार केला काढीन तर पुण्यातच प्रबोधन छापखाना काढीन, अशा संकल्पाने मी बाहेर पडलो. अनेक मित्रांना प्रबोधन-भक्तांना नि छापखान्यासाठी देणग्या गोळा केल्या.
मुंबईत निरनिराळ्या व्यापाऱ्यांकडून छापखान्याचे साहित्य खरेदी करून पुण्याला पाठवीत गेलो. तेथे दत्तोपंत देशमुख आणि कद्रेकर माझ्या बिऱ्हाडाच्या जागेतच सर्व व्यवस्था लादीत होते. गुजराथी टैप फौंड्रीकडून नवे कोरे क्रौन फोलियोचे जर्मनमेक ट्रेडल १८०० रुपयांना खरेदी केले. आणखी वर रु. २०० पॅकिंगसाठी देऊन त्याला ते पुण्याला पाठवायला सांगितले. त्यावेळी मी पनवेलीला गेलो होतो. तेथे दत्तु देशमुख धावत आला नि ट्रेडलचे एक चाक चक्काचूर होऊन आल्याचे सांगू लागला. त्या व्यापाऱ्याला भेटून तक्रार केली. गुजराथीच तो. त्याने कानावर हात ठेवले. वखारीतून माल बाहेर पडल्यावर आम्ही जबाबदार नाही.
म्हणू लागला. अरे पण शहाण्या, पॅकिंगसाठी रोख २०० रुपये दिले, मग वाडीबंदरनेच का शेरा दिला की बैंकिंग व्हेरी लूज म्हणून? गुजराथी व्यापाऱ्याशी हेंगल घालण्यात काहीच अर्थ नसतो. ट्रेडलचे मुख्य चाकच दुभंगलेले ते ठाकठीक करण्यासाठी दापोडीच्या फॅक्टरीत टाकले. ते तयार होऊन येणे, छपाई चालू होणे. प्रबोधनाचा चौथ्या वर्षाचा पहिला अंक बाहेर काढणे, इत्यादी उलाढालीत महिना गेला. बुधवारातून हुसकावला, पण लेकाचा सदाशिव पेठेत उपटला. म्हणून कारवाईखोर नारो-सदाशिव शनवाऱ्याच्या अंगाचा तिळपापड उडाला. तो काळच तसा कठोर संघर्षाचा होता. ब्राह्मण-ब्राह्मणेतरांत आडवा विस्तव जात नव्हता. खरा जातीयवाद त्याकाळीच उफाळलेला होता.
नये म्होरक्ये सरसावले
जेथे जवळकर या दुकलीने बामणेतरी चळवळीत भाग घेतला होता. अण्णासाहेब लठ्ठे, भास्करराव जाधव वगैरे पुढारी मंत्रीपदाचा डाग लागल्यामुळे जनता संपर्काला असून नसून सारखे झाले होते. बामणेतरांचे पुढारी सरकारदरबारात मंत्री म्हणून कारभार पाहू लागले. म्हणजे बहुजन समाजात सर्वांगीण उत्कर्ष हा हा म्हणता होईल. हा एक सिद्धान्त सर्व सभांतून घोषणेसारखा बडबडला जात असे. लठ्ठे, जाधवराव, कूपर, कांबळी वगैरे अर्धा डझन बामणेतर पुढारी मंत्रीपदांची बिरुदे लेवून आंग्लाई कारभारात बसली आणि त्या घवघवीत घोषणेचा बहुजन समाजाचा संपूर्ण भ्रमनिरास झाला! चळवळ जवळजवळ निर्नायकी होत असताना जेधे आणि जवळकर हे दोन तरुण मराठे चळवळीच्या अग्रभागी येऊन ठाकले. आंदोलनाला एक न्याराच लढाऊ रंग चढला. छत्रपती शाहू महाराजांच्या प्रसादाने पुण्यात निघालेली आलतूफालतू बामणेतरी वृत्तपत्रे आपला तेरड्याचा रंग तीन दिवस दाखवून बंद पडली. टिकाव धरून जोरदार राहिला तो फक्त श्रीपतराव शिंद्यांचा विजयी मराठा. जेथे जवळकरांनी `मजूर` नावाचे साप्ताहीक चालू केले. या बामणेतर पत्राला टोल्यास टोला. देण्यासाठी बामण कंपूने गणपतराव नलावड्यांच्या संपादनाखाली `संग्राम` नावाचे साप्ताहिक चालू केले.
मजूर संग्रामची टकराटकरी
जेथे जवळकरांचा मजूर छापखाना म्हणजे फक्त टायपांच्या केसीसचा. यंत्र वगैरे तेथे काही नव्हते. टाइपसुद्धा फक्त पायका. मथळ्याच्या मोठ्या टाइपाची हेडिंगे माझ्या प्रबोधन छापखान्यातून नेत असत. मंगळवार पेठेत घोरपडे बाईचे एक मोठे सिलिंडर छपाई यंत्र होते. हजार प्रतींच्या छपाईबद्दल ती म्हातारी बाई ३ रुपये भाडे आकारीत असे. कागद, शाई, यंत्र चालवणारे मजूर हे ज्याचे त्याने न्यावे. पुष्कळ लोक या यंत्राचा फायदा घेत असत. रात्री १२ च्या पुढे कंपोज केलेल्या मजकुराच्या सुपड्या घोरपडे यंत्रावर छापण्यासाठी नेत असत. नलावड्यांचा `संग्राम` पुणे चित्रशाळेत छापला जायचा. येथे एक मुद्दा सांगायला विसरता कामा नये, त्यावेळी सर्व वृत्तपत्रांवर प्रेस अॅक्टचा दरारा करडा चालू होता. तोहमत आलीच तर जेलयात्रेला तयार असलेल्या इसमाच्या नावेच पत्राचे डिक्लेरेशन केले जात असे. मजूर पत्रासाठी लाड नावाच्या कंपाझिटाराने संपादक, मुद्रक आणि प्रकाशक म्हणून डिक्लेरेशन केले होते. संग्रामासाठी पानपट्टीचे दुकानवाले गणपतराव नलावड्यांनी तोच मार्ग पत्कारला होता. मजूरचे सगळे संपादकीय लिहिण्याचे काम जवळकर एकटा करीत असे.
संग्रामचे लेखन कोणी गोखले नावाचे तरुण करीत होते. दोन्ही पत्रे दर शनिवारी सकाळी बाहेर पडत असत. त्यात मौज अशी की, त्या दिवशीच्या संग्रामातल्या अग्रलेखाला त्याच दिवशी मजूरचा अग्रलेखी ठणठणीत टोला हाणलेला असायचा. सगळ्या पुण्याभर हा एक तर्कवितर्काचा नि अचंब्याचा प्रश्न झाला होता. हा चमत्कार कसा व्हायचा त्याचे गुढ सांगायला आता काही हरकत नाही. चित्रशाळेतले मराठे कंपाझिटर किती झाले तरी बामणेतरी चळवळीचे अभिमानीच असणार. संग्रामचा अग्रलेख कंपोज होऊन त्याच्या फायनल प्रुफाच्या दोन प्रती ते काढीत. त्यातल्या एकीचा चोळामोळा गुंडाळा करून खिडकीबाहेरच्या गल्लीत टाकून देत. मजूर छापखान्यात प्रभाकर चित्रे नावाचा चलाख तरुण होता. रात्री ८ वाजता काळोख पडला म्हणजे तो सायकलवर येऊन गल्लीतले ते कागदाचे भेंडोळे उचलून पसार होत असे. प्रुफ हस्तगत झाल्यावर मग हो काय. जवळकर एका बैठकीत एकटाकी जबाबाचा मजकूर लिहून मोकळा होत असे.
देशाचे दुष्मन खटला
जवळकराने भाषेप्रमाणेच एक विशेष धारदार लेखनशैली कमावली होती. त्याच्या सर्व हालचालीत आणि चळवळीत केशवराव जेधे यांची भूमिका फक्त `गोष्टी सांगेन युक्तिच्या चार` यापेक्षा अधिक नव्हती. जवळकराने `देशाचे दुष्मन` नावाचे एक जहाल चोपडे लिहून प्रसिद्ध केले. जेधे जवळकर जरी दररोज माझ्या भेटीला सदाशिव पेठेत यायचे तरी या चोपड्याबद्दल मात्र त्यांनी मला केव्हाही कसलाच सुगावा लागू दिला नाही नित्याप्रमाणे संध्याकाळी माझे स्नेही शंकरराव मुळे यांच्या बुधवार चौकातील ग्रंथ विक्रीच्या दुकानात बसलो असता ते चोपडे विकणारी काही मुले रस्त्याने ओरडत जात होती ८ आणे देऊन मी एक प्रत विकत घेतली. घरी गेल्यावर पुस्तक वाचले. बामण-बामणेतर वादाने आधीच मनस्वी तापलेल्या पुण्यात टाकलेला हा जवळकरी बॉम्ब आणखी आग भडकविणार यात मला संशयच उरला नाही. त्यानंतर दोन दिवसांनी जेधे जवळकर सप्रेम भेटीची प्रत घेऊन माझ्याकडे आले. व्रत हातात घेऊन मी म्हटले "परवाच मी एक प्रत बाजारात विकत घेतली." त्यावर त्यांनी खुलासा केला "अहो, आम्हाला दोन दिवस यायलाच झाले नाही."
तर्क केल्याप्रमाणे त्या पुस्तकाने पेटवायची ती आग पेटवली. बामण कंपूचे पुढारी ल. ब. भोपटकर वकील यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे फिर्याद गुदरली. फिर्यादीत तक्रारीचे कोणते कलम किंवा कलमे दाखविली होती. कोण जाणे पण त्या पुस्तकाचे लेखक जवळकर, प्रकाशक केशवराव जेधे आणि प्रस्तावना लेखक बागडे वकील या तिघांना ताबडतोब पकड वॉरंटाने कैद करून त्यांची येरवडा जेलमध्ये झटपट रवानगीही झाली. तो शनिवार होता. जामिनीची खटपट सोमवारशिवाय होणारच नव्हती तीन दिवस तरी तिघांना जेलच्या कांजीवर जगणे भाग झाले. जामिनावर सुटका झाल्यावर खटल्याची तारीख आणि सुनावणी.
सदाशिव पेठेतील माझी प्रबोधन कचेरी म्हणजे महाराष्ट्रातल्या एकूण एक बामणेतर पुढाऱ्यांच्या बैठकीचे नि भेटीगाठीचे केंद्र बनली होती. इतकेच नव्हे तर लोकमान्यपुत्र रामनाऊ आणि बापू टिळक याचीही सकाळसंध्याकाळ तेथे ये-जा असायची. "अहो, या ठाकऱ्याने टिळकांची पोरटीही बगलेत मारली की हो!" अशी बामणी कुजबूज नेहमी माझ्या कानावर येत असे. या बनावामुळे पुण्यातल्या बामणेतरी असंतोषाला हा ठाकरेच कारणीभूत आहे. अशी पुणेकर बामण कंपूने आपली समजूत करून घेतली. होती. पण फर्ग्यूसन कॉलेजतल्या ५-६ प्रोफेसरांच्या बैठकाही माझ्याकडे दररोज संध्याकाळी होत असत त्यांनी वाडिया कॉलेजची योजना माझ्याच माडीवर शिजवली आणि तडीला नेली. बामण कंपूचा दुसरा एक गैरसमज होता. मजूर साप्ताहिकातले लेख मीच लिहीत असे हा "कालपरवा रटफ शिकू लागलेली ही मरगठ्ठी थोडीच इतके सफाईदार, शैलीबाज, तसकेदार मराठी लिहू शकतील काय?"
`देशाचे दुष्मन` पुस्तकातील भाषा आणि विधाने पाहून तर त्यांनी सिद्धांतच काढला का हे काम ठाकऱ्याशिवाय दुसऱ्या कोणाचेही नाही. जवळकर खटल्याची सुनावणी चालू असता भोपटकर वकील गुरगुरत म्हणाले "ह्या पुस्तकाचे लेखक म्हणून जवळकरांनी जरी आपले नाव घातले असले तरी खरा लेखक कोण आहे तो लवकरच आम्ही बोर्डावर आणणार आहोत." सुनावणीच्या वेळी दोन्ही पक्षांच्या वकिलांची बाचाबाची वगैरे नेहमीचे सोपस्कार यथासांग होऊन तिघाही आरोपींना शिक्षा झाल्या. दंडाच्या का कैदेच्या का दोन्ही आता आठवत नाही. त्यावर अपील झाले अपील चालवण्यासाठी डॉ. आंबेडकर धावून आले. त्यांनी आरोपींची बाजू लढवली आणि तिघाजणांची निर्दोषी म्हणून सुटका केली.
बावला खून खटला नि होळकर
छापखाना चालू झाला (१९२५) त्याच वेळी मुंबईत बावलाचा खून झाला. रोजच्या रोज त्या खटल्याच्या बारीकसारीक बातम्या वृत्तपत्रात येत असल्यामुळे, लोकमत विलक्षण ताणले जात होते. त्यातल्या त्यात त्या खुनाच्या खटल्यात श्रीमंत तुकोजीराव होळकर याचा संबंध दाखवून, त्यांच्याविषयी भयंकर चिथावणीचे लेख मुंबई-पुण्याच्या इंग्रेजी-मराठी पत्रांतून सारखे येऊ लागले. ज्यांनी खुनाचा कट केला नि खून पाडला. त्यांनी गुन्हा कबूल करून, त्यांना फाशीच्या नि जन्मठेपीच्या शिक्षाही झाल्या. तरीही होळकरांविषयीच्या संशय-दंशाची नांगी काही केल्या कमी होईना. गुन्हेगार शिक्षेला गेले तरी `खरा गुन्हेगार मोकळाच आहे` या आरोळ्या वृत्तपत्रात रोजच्या रोज जोरजोराने चालूच राहिल्या.
संस्थानिक द्वेषाची फॅशन!
ब्रिटिशांविषयी फारसा आदर नसला, तरी देशी नि विशेषतः मराठा संस्थानिकांविषयी आत्यंतिक द्वेष वेळीअवेळी व्यक्त करण्याची एक फॅशनच रूढ होती. देशभक्तीचा तो एक ट्रेडमार्कच होऊन बसला होता. ब्रिटिश नोकशाहीच्या नावाने दररोज दहा पायली खडे फोडले, तरी एखाद्या करवीरकर छत्रपतीच्या विरुद्ध अथवा गायकवाड होळकरांविरुद्ध गुंजमासा खुसपट आढळले तर त्या काट्याचा नायटा करून, गोऱ्या नोकरशाहीच्या दरबारात ठणाणा करायला देशभगतांच्या टोळक्यांची उणीव पडत नसे. तशात बावला प्रकरणात तर होळकरांच्या रखेलीचा संबंध आलेला! मग हो काय? कसाबसा त्या खुनाशी त्या संबंधाचा संबंध जुळवून होळकराला नेस्तानाबूद करण्यासाठी महाराष्ट्रातील एकजात बामणी पत्रे पिसाळलेल्या कुत्र्यासारखी होळकरांवर तुटून पडली. ज्यांला जे वाटले से तो बेगुमान भक्त लिहीत सुटला. या पुण्यकर्मात बॉम्बे क्रॉनिकल, अच्युतराव कोल्हटकरांचा चाबूकस्वार, तटणिसांचे विविधवृत्त ही आघाडीला होती. अशा पर्वणीत स्वतःला जाहिरात-जनार्दन म्हणविणारे अनंतराव गद्रे थोडेच मागे रहाणार?
होळकरांवरील टीकेने अखेर बीभत्स नि अश्लीलपणाची सीमा सफाचाट उल्लंघन केली. काही दिवस महाराष्ट्रात विवेक हद्दपार झाला. सगळीकडून एकच हुचमल्ली झाल्यामुळे एरवी वाघाच्या डरकाळ्या फोडणारे बामणेतरी `ईरपीर` भांबावून जाऊन मूग गिळून बसले. ते तरी काय करणार? बामणेतरी पत्रे ती किती? आणि जोमदार सरावाचे पत्रकार ते किती? बामणेतरी वादापुरती त्यांनी तोवर कितीही हंबीररावी दाखवली तरी ती सारी होती शाहू छत्रपतींच्या पाठिंब्यावर. तो पाठकणा यावेळी नव्हता. विजयी मराठा, राष्ट्रवीर, दीनमित्रासारखी चार दोन पत्रे त्या प्रचाराला जाबसाल करायची. पण प्रतिस्पर्ध्याच्या झंजावातापुढे त्यांचा टिकाव लागेना. एरवी गावोगाव जाहीर सभा घेऊन निषेध विकारांचा दणदणाट उडविणारे बामणेतरी पुढारीसुद्धा घरोघर गाल खाजवीत बसले.
फर्ग्युसनी प्रोफेसरांची बैठक
माझ्या माडीवर बिनचूक दररोज सायंकाळी ठरलेली. बावला खटल्याच्या दैनिक वातावर त्यांच्या चर्चा चिकित्सा अखंड चालायच्या. प्रबोधन चालू झाल्यामुळे, मी त्या प्रकरणाला दमदार तोंड द्यावे, असा त्यांचा आग्रह चालू झाला. सुरुवातीला, `महामायेचा थैमान` मथळ्याचा एक विस्तृत लेख मी छापला. त्या अंकाला भरमसाट मागणी आल्यामुळे त्याची एक आणा किंमतीची ५ हजार प्रतींची एक पुस्तिका प्रसिद्ध केली. तिच्या लागोपाठ ३ आवृत्त्या काढाव्या लागल्या. होळकर प्रकरणातले सत्य काय, याचा महाराष्ट्रातल्या बहुजन समाजांना साक्षात्कार होऊ लागला, तसतसे गावोगावचे लोकमत विरोधी पत्रांवर बहिष्कार घालण्याइतके धीट बनत गेले, आधीच माझ्याविषयी नारो-सदाशिव-शनिवाऱ्यांचा दात पाजळलेला.
तशात होळकरांची बाजू घेऊन मी सरसावलेला आढळताच, मला कच्चा चावाया का भाजून खावी, यावर ते आपली भणाणलेली डोकी खाजवू लागले. बावला प्रकरणातील ५-६ प्रकरणांचा मुद्द्यापुराव्यानिशी स्फोट करणाऱ्या आणखी ५-६ पुस्तिका मी बाहेर काढल्या. ठिकठिकाणच्या वृत्तपत्रविक्रेत्यांनी त्यांच्या शेकडो प्रतींच्या मागण्या चालू ठेवल्या शिवाय, प्रबोधनातही मराठीच्या जोडीने इंग्रेजीतही जळजळीत लेख प्रसिद्ध करीतच होतो. त्या वेळच्या सर्व लेखनाच्या मुद्यांची सायंकाळच्या फर्ग्युसनी मंडळात प्रथम अस्तिनास्ति चर्चा व्हायची.
नेहमीच्या ठराविक आक्षेपांचा बाजार
मुद्याला मुद्दा देण्याचे भांडण संपले. म्हणजे वैयक्तिक बदनामीचे शस्त्र बाहेर काढायचे, हा पुणेरी खाक्या सर्वश्रुत आहे आणि त्याचे सांप्रदायिकही सध्या हयात आहेत. ज्याअर्थी होळकरांची बाजू घेऊन हा आमच्याशी इतक्या तिरमिरीने किंवा तेरीमेरीने होड घ्यायला सरसावला आहे, त्याअर्थी, त्यापक्षी, त्याअन्वये, त्याला होळकरांचा भरमसाट मलिदा गिळायला मिळाला असला पाहिजे खास. त्याशिवाय का कोण या संस्थानिकाच्या पाठिंब्याला उभा राहणार? हा आक्षेप केवळ ब्राह्मणांनीच फैलावला, असे नव्हे, तर बरीच बामणेतर मंडळीही त्या सुरात आपला बदसूर मिळवीत होती. कारण स्पष्ट आहे बामणेतरी आकांडतांडवाचा धोशा नारोशंकरी गडगडाटाने कोठवर चालला होता? शाहू महाराजांच्या गंगाजळीतले थेंब जोवर चळवळ्यांच्या हातांवर ठिबकत होते तोवर ती बंद होताच आंदोलनाचा जोर ओसरला. असल्या थेंबचाटूनी माझ्या मलियाच्या बमन्याच्या बामणी चपात्या लाटणीला चारदोन थेंब तेल पुरविल्यास, नवल ते कशाचे? असल्या गावकुटाळकीला मी थोडाच भीक घालतो?
`टेम्प्ट्रेस` ने उठवलेले तुफान
महामायेचा थैमान मराठीत लिहिला. पण त्याचा परिचय बिनधोक सर्वत्र व्हावा, या हेतूने मी `ट्रेम्प्ट्रेस` नावाचे एक इंग्रेजी पुस्तक लिहून प्रसिद्ध केले व्हीलर कंपनीमार्फत त्याचा सर्व हिंदुस्थानामर प्रसार झाला. सुरुवातीला ५ हजार प्रती काढल्या, पण एका आठवडयातच मागणी वाढल्यामुळे आणखी ५ हजार छापल्या. त्याची एक प्रत कै. नाम. नानासाहेब समर्थ त्यांना लंडनला पाठविली. "दीडशे प्रती ताबडतोब पाठवा", असा त्यांचा लंडनहून केबल आला नि त्या मी बोटीने रवाना केल्या. तिकडे हौस ऑफ कॉमन्स आणि हौस ऑफ लार्ड्सच्या सभासदांच्या पीजनहोलमध्ये एकेक प्रत टाकली.
त्या इंग्रेजी पुस्तकात हॉर्निमनविषयी एक संदर्भ आला होता. बॉम्बे क्रॉनिकलच्या काही आक्षेपांना उत्तर देण्यासाठी तो द्यावा लागला. झाले. हॉर्निमनची अब्रू त्या संदर्भाने रसातळाला गेली आणि त्याने माझ्यावर बेअब्रूची फिर्याद गिरगाव कोर्टात ठोकली. होळकराचा मलिदा खाल्ला म्हणून बोभाटाच्या टिमक्या पिटलेल्या ठाकरेला त्या खटल्याच्या वेळी बालिस्टर करायला खिशात दमडीही नव्हती. खटला मुंबईला नि मी राहणार पुण्याला `आली का पूना-टू-बाम्बे अॅण्ड बँक` ची आफत? कै. अनंतराव गडकऱ्यांना भेटलो. ते म्हणाले बालिस्टर करावा लागेल. त्याची फी रोज शंभर रुपये, गडकरी स्वतः क्रिमिनलचे विख्यात अॅडव्होकेट. पण त्यांनी बालिस्टरचा हेका धरला. आजारात आणि कोर्टींय खटल्यात वैद्य, डॉक्टर वकिलांशी स्वतःच्या अकलेची होड घेण्यात अर्थ नसतो.
माझ्यावरील खटल्याची माहिती दादरकरांना झालीच होती आणि मी त्यासाठी दादरला आल्याचे कळताच अनेक मंडळी येऊन भेटू लागली. उद्या खटला आहे, पण ठाकऱ्यांजवळ दमडीही नाही, शंभर रुपयांचा बालिस्टर करणार कसा? ही कुणकुण खाडके बिल्डिंगजवळच राहणाऱ्या देवधर नावाच्या प्रबोधनभक्ताला समजताच, रात्री ११ वाजता ते स्वतः मला येऊन भेटले. "ठाकरे घाबरण्याचे कारण नाही, हा देवधर तुमच्या पाठीशी उभा आहे. हे घ्या शंभर रुपये. आणखी लागतील तर मला सांगा, खटला लढवा." या देवधरांसारखे अनेक स्नेही मला वरचेवर लाभत गेल्यामुळेच संसाराचा नि व्यवहाराचा काटेरी गाडा मी धैर्याने रेटू शकलो.
लाख रुपये किंमतीचा अनुभव
आपली भाषा मराठी. तीतच आपण लेखन भाषण करणार. त्या भाषेच्या खाचाखोचा जशा आपल्याला समजतात नि समजून सांगता येतील. तशा केवळ आंग्लविभूषित बालिस्टरला त्या समजणारही नाहीत. समजल्याच नाहीत, तर नुसत्या इंग्रेजी भाषांतरावरून तो खटला तो काय कपाळ लढवणार? सरकारी पुरावा ओरियंटल ट्रान्सलेटरच्या अकलेचा. खटला चालणार इंग्रेजीत. न्यायाधीश मराठीभाषी नसला का आणखी मोकांड. सध्या मराठी शब्दांची सरकारी भाषांतरे गिरणीतून बाहेर पडताना कसली वाताहत होते. याची एक सत्यकथा, आठवण झाली म्हणून संदर्भ संबंध नसताही येथेच सांगतो.
श्री. बी. टी. रणदिवे हे `रेल्वेमन` नावाचे एक मराठी साप्ताहिक चालवीत होते. त्यांच्यावर राजद्रोहाचा झाला खटला. त्यात एक वाक्य असे होते-
या कल्पनेच्या चौकटीत ही वस्तुस्थिती बसते यातल्या `चौकट` या शब्दाचे भाषांतर ओरियंटल ट्रान्स्लेटर महाराजांनी काय केले होते माहीत आहे? चौकट म्हणजे `कॉन्स्पिरसी ऑफ फोर व्हिलन्स`, (चार कारवाईखोरांचा कट.) आता काय करणार या कर्माला? अनंतराव गडकरी नि बॅरिस्टर वेलिंगकर रणदिव्यांची केस लढवीत होते. गडकऱ्यांना मी हळू कानात सांगितले, "हे पहा, चौकट म्हणजे चार लुच्च्यांचा कट, मग पाच लुच्च्यांचा, सहा लुच्च्यांचा असला तर कोणता शब्द वापरता? असे विचारा सरकारी साक्षीदाराला पाचांचा पेकेट का पांकट आणि सहांचा म्हणजे छेकट का छाकट?" तसा प्रश्न विचारताच साक्षीदाराची भंबेरी उडाली.
`युवर वर्शिप` शब्दाचे मोल रु. शंभर!
खटल्याचा प्राथमिक घटपटादी पहिल्या दिवशी झाला. आमच्या बालिस्टराने एकदाच तोंड उघडले ते फक्त `युवर वर्शिप` हा शब्द बोलण्यासाठी आणि तेवढ्यासाठी माझी दक्षिणा किती? तर शंभर रुपये! तारीख पडली, या दिवशी विश्रांति-तासानंतर मॅजिस्ट्रेट साहेबांनी दोघा भांडकुदळ कोंबड्यांना नि त्याच्या वकिलांना चेंबरात बोलावले. चेंबरात दोन्ही बाजूंनी मेंबरं जमा झाली. मॅजिस्ट्रेट बोलू लागले- "हे १९२६ साल म्हणजे अब्रूचे भरमसाट पिकाचे साल आहेसे वाटते. याच कोर्टात एकंदर सहा अब्रूचे खटले आहेत. दोन साध्यासुध्या असामींनी एकमेकांवर बेअब्रूच्या फिर्यादी केल्या तर त्यात आश्चर्य नाही. पण रोजच्या रोज कोणा ना कोणाची अब्रूच घेण्याचा धंदा करणाऱ्या दोन वृत्तपत्रकारांनी `याने माझी अब्रू घेतली हो` म्हणून कोर्टकचेऱ्या कराव्या, हा देखावा मोठा चमत्कारिक म्हणा, मनोरंजक म्हणा, पण आहे खरा तसा. आणि खटल्यात व्हायचे काय? तर ह्याने त्यांची घाणेरडी रकटी बोर्डाच्या फलाटावर धुवायची नि त्याने यांची. हेच ना? (मला नि हॉर्निमनला उद्देशूनं) तुमचा धंदा काय? टीका प्रतिटीका, हाच ना? त्यासाठी कोर्टकचेऱ्या कशाला? किक् अॅण्ड अपालगाईज, बस्स. एवढाच. लाथ मारावी. क्षमा मागावी. पुन्हा तेच करावे. आहे काय त्यात एवढे? परस्परांत समझोता करा."
झाले. मी क्षमा मागावी, ती २-३ वर्तमानपत्रांत छापावी, यावर तडजोड झाली नि हॉर्निमनची अब्रू सनलाइट सोपसारखी स्वच्छ धुऊन निघाली.
प्रकरण १५
पुण्याच्या बुधवारात फुल्यांचा पुतळा
`देशाचे दुष्मन` खटल्यापासून पुण्यात बामण-बामणेतर वाद अगदी वर्दळीवर आला. जेधे मॅन्शन आणि गायकवाड वाडा अशा दोन लढाऊ गनिमांच्या छावण्या थाटल्या गेल्या. नेमक्या याच सुमाराला बुधवार पेठेत मोक्याच्या जागी महात्मा फुले यांचा पुतळा मुन्सिपालटीने उभारावा, असा केशवराव जेध्यांनी ठराव मांडला. मग हो काय! आधीच वातावरण तापलेले, त्यात ही आणखी ठिणगी, मुन्सिपालटीत वादावादीचा भडका उडाला. बहुसंख्य बामण मेंबरांनी ठरावाला कट्टर विरोध केला. इतकेच नव्हे तर काही बामणेतर मेंबरानांही फितवून आपल्या कळपात ओढले. त्यात ज्योतिरावांचा `पुतण्या` म्हणून फुले नाव सांगणारे एक पात्र होते. महात्मा फुल्यांची अर्वाच्य नि बेफाट निंदा टवाळी करण्यात या बाबुराव फुल्याने बामण निंदकांवरही ताण केली. "कसला आलाय तो जोती महात्मा? तो तर बाटगा किरिस्ताव होता. त्याचा कसला आलाय पुतळा?" इत्यादी ग्राम्य शिव्यागाळीची एक पुस्तिकाच त्या फुल्याने छापून पुणेभर मोफत वाटली. मुन्सिपालटीच्या बैठकीत तर काय जेधे आणि विरोधक यांचा वाद मुद्यांवरून गुद्यांवर घसरत जाऊ लागला. दोन्ही पक्षांच्या हस्तपत्रिकांनी पुण्याचे सारे रस्ते शाकारून टाकले. पंधरवडाभर पुण्यात प्रत्यक्ष शिमगाच उफलला. अखेर ठराव नापास झाला, कारण तो व्हायचाच होता.
फुले पुतण्याने महात्मा ज्योतिरावांना बाटगा किरिस्ताव वगैरे दिलेल्या शिव्या दुसऱ्या दिवशी मंडईभर ज्याच्या त्याच्या तोंडी ऐकू येताच, तेथल्या एकजात माळणींनी त्या पुतण्याच्या नावाने कडकडा हात चोळून शाप दिला. `मेल्याच्या तोंडात किडे पडतील.` हृदयाच्या तळतळाटाने दिलेला तो शाप अक्षरश: खरा ठरल्याचे मी प्रत्यक्ष पाहिले.
परिस्थितीच्या ढकलणीसरसा कर्जत सोडून पुन्हा (१९३०-३१) मी पुण्याला नवी पेठ येथे रहात होतो. शेजारीच त्या फुल्याचे वास्तव्य होते. प्रेत नेण्याची रहदारी त्याच रस्त्याने होत असे. एका सकाळी कुणाचे तरी प्रेत जात होते. बरोबर फार मोठा जमाव होता. अनेक ठळक नागरिक त्यात दिसले. अॅडव्होकेट भाऊसाहेब गडकरी त्यात दिसताच मी त्यांना हाक मारून "कोण गेल हो?" म्हणून विचारता ते म्हणाले - "वा, माहीतच नाही का तुम्हाला? तुमच्या अगदी शेजारची केस. बाबुराव फुले गेले कित्येक दिवस घशाच्या रोगाने आजारी होते. सारखे किडे पडायचे तोंडातून. त्याने आज पहाटे अंगावर राकेल ओतून आत्महत्या केली."
केले तुका, झाले माका
पुतळा प्रकरणाचे आधण उतास जात असतानाच पुण्यात गणेशोत्सवाची धामधूम चालू झाली. वादावादीचा फाल्गुन चालू होताच, त्यात आणखी उल्हासाची भर! त्यावेळेपर्यंत बामणी जहाल गटाच्या विरोधकांची जाहीर टर टिंगल उडविण्याचे कंत्राट घेतलेला टिळक कंपूचा `सन्मित्र समाज मेळा` सालोसाल गाजत गर्जत होता. केसरीछाप वृत्तपत्रांच्या पाठिंब्याची जहाल पक्षाची हा मेळा एक जबरदस्त राजकरणी शक्ती होती. गत सालातल्या साऱ्या जहाल मवाळ वादाच्या उखाळ्या पाखाळ्या त्या मेळ्याच्या पदांतून गायल्या जायच्या. गायकवाड वाड्यात लो. टिळकांच्या अगदी नाकासमोर. त्यात गोखल्यांची नि त्यांच्या पार्टीतील रँग्लर परांजपे प्रभृती मंडळींची भरपूर निंदा नालस्ती असायची. अखेर अखेर तर सन्मित्राचे निंदासत्र इतके मोकाट बहकले की कॉलेजात जाणाऱ्या तरुण मुलींचीही वाह्यात टवाळी होऊ लागली. अनेक विचारवंतांना याची चीड यायची, पण करतात काय? जहालाग्रणीच जेथे ती आचरट पदे जिभल्या चाटीत नि टाळ्या कुटीत ऐकायचे, तिथे विरोध करावा कोणी? मेळ्यांच्या पदांवर पोलिसी सेन्सारशिप ती याच मेळ्याच्या वाह्यातपणामुळे.
शेराला सवाशेर कधी ना कधी भेटायचाच. बामणांच्या सन्मित्री मेळ्याच्या टोल्याला टोला देण्यासाठी, जेधे जवळकरांनी आपला छत्रपती मेळा चालू केला. मेळा आला का त्याची पद्यावली नि पाठोपाठ पोलिसी सेन्सारची कात्री ठरलेलीच. छत्रपती मेळ्याच्या तालमी चाललेल्या पदांचा गवगवा पुण्याचे वातावरण गरमागरम करू लागला. त्यातल्या त्यात पुणे मुन्सिपालटीच्या कारभारावर रचलेले `सगळा नकट्यांचा बाजार` हे गाणे पोराटोरांच्या तोंडी गल्लोगल्ली गरजू लागले. वर्दीचे लोण फरासखान्यापर्यंत पोहचले. छत्रपती मेळ्याची सगळी पदे नापास झाली. पदांशिवाय मेळा कसा गाजणार वाजणार? त्यावर केशवराव जेध्यांनी शक्कल काढली. एक बॅंड भाड्याने घेतला. त्याने मेळा रस्त्याने जाताना `सगळा नकट्यांचा बाजार` पदाचे नुसते सूर वाजवायचे आणि मेळ्यातल्या मंडळींनी खुळखुळ्यांच्या काठ्यांचा त्या तालात फक्त ठेका धरायचा. परिणाम विचित्र झाला. पदांचे चोपडे आधीच छापून बाहेर पडलेले असल्यामुळे, लोकांना ते गाणे तोंडपाठ झाले होते. बॅंडचे सूर बाजू लागले का रस्त्याच्या आजूबाजूला जमलेले लोक त्या सुरात ते गाणे मोठ्याने बोलून साथ देऊ लागले. सेन्सारी कात्रीने मेळेवाल्यांचे तोंड बंद केले, पण आता लोकांच्या तोंडांवर कोण हात ठेवणार?
आक्रस्ताळेपणाला काही मर्यादा?
सन १९०४ पासून मी शेकडो आंदोलने नि चळवळी पाहिल्या. कित्येकांत तर मी भागही घेतला होता. पण सन १९२५ सालच्या फुले पुतळा प्रकरणासारखी कमाल आकसबाज चळवळ पुन्हा पाहिली नाही. वर्गवाद म्हणा, जातीयवाद म्हणा, काय वाटेल ते नाव द्या, माणसांना साध्यासुध्या माणुसकीची तर चाड उरलीच नव्हती, पण सभ्यपणालाही ते आरपार मुकले होते. तत्त्व गेले उडत, प्रतिपक्षाला सत्त्वहीन शीलहीन करून ठेचायचा कसा, यावरच उभयपक्षीय पुढाऱ्यांनी अगदी खालच्या पातळीवरून कारस्थाने लढविण्यात अकलेचा उकिरडा केला होता.
गणेशोत्सवाची धामधूम सगळीकडे चालू असतानाच, "शुक्रवारे बामणेतर बामणी पेठेतील घरांवर हल्ले करणार आहेत, बायकांनी सायंकाळी नेहमीप्रमाणे वाड्याच्या दरवाजावर येऊन उभे राहू नये." अशी एक हूल दिली फैलावून कोणीतरी. मग हो काय विचारता? सगळ्या नारायण सदाशिव शनिवार पेठेतले तरुण बामण पेहेलवान लाठ्याकाठ्या घेऊन आपापल्या मोहोल्यात गस्ता घालू लागले. एरवी जरी जहाल मवाळ पक्षीयात आडवा उभा विस्तव जात नसे, तरी यावेळी प्रसंगाचा (?) गंभीरपणा हेरून ते एकदम एकवटले. गणेश खिंडीत नामदार गव्हर्नर साहेबांची स्वारी आल्याचे कळताच, नरसोपंत केळकर आणि रॅंग्लर परांजपे यांच्या नेतृत्वाखाली बामणांचे एक शिष्ठमंडळ नामदारांकडे गेले. त्यांनी ताबडतोब जिल्ह्याजिल्ह्यातल्या पोलिसांच्या पलटणी पुण्याच्या बंदोबस्तासाठी मागविल्या. पुणे शहराला लष्करी छावणीचे रूप आले.
पुतळ्यावरून आकाश-पाताळ!
ज्योतिराव फुल्यांचा पुतळा बुधवारात उभारावा, असा केशवराव जेध्यांनी पुणे म्युनिसिपालिटीत एक ठराव तो काय मांडला आणि तेवढ्यावरून सबंध पुणे शहरात बामण-बामणेतरांची रणधुमाळी ती काय उसळली! आजच्या घडीला त्याचा विचार करता, खरोखरच फार आश्चर्य वाटते. कारण, सध्या म. फुल्यांचा जयजयकार करण्यात मंत्र्यांपासून संत्र्यांपर्यंत अनेक गोमा-गणेश अहमहमिकेने फुरफुरलेले दिसतात. ज्या मनोवृत्तीने सन १९२५ साली फुल्यांचे नुसते नाव काढणारांची ससेहोलपट झाली आणि त्या महात्म्याच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार लेखी तोंडी करण्यात आक्रस्ताळेपणाचे शिखर गाठले, त्या वृत्तीने त्या सालच्या गणेशोत्सवाचे मावंदे मायबाप सरकारच्या हातलावणीने कसे साजरे झाले, त्याचा खास अहवाल दिनांक ७ सप्टेंबर १९२५ च्या `प्रबोधना`च्या खास जादा पुरवणीने मी प्रसिद्ध केला होता. शिवाय, त्याच अंकात `पुतळ्याचा प्लेग` या शीर्षकाचा एक अग्रलेखही लिहिला होता. त्याचा एक तुकडा त्याकाळच्या सार्वजनिक मनःस्थितीची चालू घडीच्या मंडळींना किंचितशी अटकळ करून देईल. तो असा-
"पुण्यास रहाणाऱ्या कोणत्याही माणसाचे डोके आजकाल तपासा, त्यांत संगमरवरी धोंडे, घणाचे फटकारे आणि पाथरवटांचा तांडा, यांचा नुसता धुमाकूळ उडालेला दिसेल. ज्याच्या त्याच्या तोंडात पुतळा. घरात पुतळा, दारात पुतळा, हॉटेलात पुतळा, पोलीस चावडीवर पुतळा, ओंकारेश्वरावर पुतळा, जिकडे पहाल तिकडे पुतळाच पुतळा! मारे पुतळ्यांचा प्लेगच पुण्यात बोकाळला आहे. एरवीच्या प्लेगावर इंजेक्शनचा उपाय तरी आहे, पण या पुतळ्याच्या प्लेगावर इंजक्शनचा उपाय योजण्याविषयी सरकारी दवाखान्यात नव्हे, नव्हे, सरकारी खलबतखान्यात अजून एकमत होत नाही. प्लेगाने घरातल्या माणसांचे मुडदे पडतात. या पुतळा-प्लेगाने मंडईसमोर माणसांचे खून पडतात की काय, अशी जबरदस्त भीती ४ सप्टेंबरपर्यंत आमजूर कलेक्टरापर्यंत सर्वांना होती. पण गणपतीबाप्पाने `विघ्नाची वार्ता` फोल ठरविली आणि हा पुतळ्याचा प्लेग म्हणजे वाटला तितका डोकेफोडीचा नसून त्यामुळे मुद्रणालयांची मात्र पोळी बरीच पिकणार असा रंग दिसतो. कारण, हल्ली हस्तपत्रिका, पुस्तके, लीफलेटे यांचा इतका सुळसुळाट उडाला आहे की मुन्सिपालटीच्या झाडूंना त्यांच्याशिवाय रस्त्यावर झाडायलाच दुसरे काही मिळत नाही."
जेधे जवळकरांचा सूत्रधार ठाकरे!
हा एक अपसमज पुणेरी कारस्थान्यांनी सगळीकडे फैलावला असल्यामुळे, आणि माझे बिऱ्हाड आणि प्रबोधन छापखाना सदाशिव पेठेत, अगदी बामणी वस्तीत असल्यामुळे, माझ्यावर त्यांचा कडवा दात सतत उगारलेला असे. यापूर्वी खिडकीतून जळता काकडा टाकून छापखान्यातल्या कागदांच्या थप्पीला आग लावण्याचा उपद्व्याप झाला होता. दोनतीन वेळा मेलेली कुजलेली कुत्री दारासमोर आणून टाकली होती. त्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी तर विरोधकांनी भलताच विक्रम केला. दुपारी १ वाजण्याचे सुमारास शेजारचे प्रि. अण्णासाहेब खाड्ये, प्रो. येवलेकर, प्रि. केशवराव कानीटकर, नानासाहेब सिंदकर वगैरे ७-८ मंडळी माझ्या माडीवर येऊन बसली होती. इतक्यात टाइम्स आला. त्यात ब्रिटिश सरकारचे मेंबर ऑफ इंडिया कौन्सिल म्हणून लंडनला गेलेले ना. नानासाहेब समर्थ यांच्या मृत्यूची बातमी आली होती. त्यावर आम्ही सारे बोलत होतो. इतक्यात कोणीतरी महणाले "अहो, इथं बसला काय? तिकडे रस्त्यावर बघा कशी हडेलहप्पी चाललीय ती." म्हणून आम्ही सारे उठून सदाशिव पोष्टाजवळ नाक्यावर गेलो. सारा तमाशा पाहिला आणि अवघ्या १० मिनिटांतच परत येऊन पहातो तो एक मेलेले कुजलेले गाढव प्रबोधन कचेरीच्या अगदी दारात आणून ठेवलेले. प्रो. समर्थ यांनी दोरी आणून त्याच्या तंगडीला अडकविली आणि आम्ही ते ओढीत नेऊन मुन्सिपालटीच्या कचऱ्याच्या पेटीजवळ नेऊन टाकले.
माझ्यावर एवढा दात असण्याचे कारण एवढेच की जेधे जवळकर बहुश: दररोज माझ्याकडे यायचे. मी मात्र पुण्यात फारसा कोणाकडे जात येत नसे. आपला व्यवसाय बरा. आपण बरे, ही माझी प्रवृत्ती आजही होती तशी कायम आहे. जेधे-जवळकर यायचे, तसे श्रीधर आणि रामभाऊ टिळकही यायचे. हे पाहून पुण्याच्या टवाळ कंपूत असाही आरोप चालू असे की "ठाकऱ्याने टिळकांच्या पोरांनाही आपल्या नादी लावले."
विसर्जनाचा दिवस उजाडला
गणेश विसर्जनाच्या-अनंत चतुर्दशीच्या दिवशी जेधे-जवळकरांचा कंपू अगदी वासुदेव बळवंती घाटाचे बामणेतरी बण्ड करणार, असा पुतळा-विरोधकांनी गणेशखिंडीत खास गव्हर्नरकडे डेप्यूटेशन नेऊन सरकारचा समज करून दिल्यामुळे, इलाख्यांतील सगळ्या जिल्ह्यांतून हत्यारबंद पोलिसांच्या पलटणी पुण्यात हजर झाल्या. शनिवार वाड्याच्या आतल्या प्रांगणात मशीन गन्स, आर्मर्ड कार्स आणून जय्यत तयार ठेवल्या. मंडईजवळचा टिळकांचा पुतळा शुक्रवार बामणेतर फोडतील म्हणून त्याभोवती २५-३० हत्यारबंद पोलिसांचा गराडा पडला. गणेशोत्सवाच्या दहाही दिवशी रस्तोरस्ती गोऱ्या सोजिरांच्या हुकमतीखाली कण्ट्री पोलिसांच्या टोळ्या सार्वजनिक अल्बेलीसाठी गस्ता घालीत होत्या. मेळ्यांची पदे तपासणाऱ्या सेन्सार कमिटीने पिठल्या भाताची पदे तेवढी पास केली, जेधे-जवळकरांच्या छत्रपती मेळ्याची सगळी पदे सेन्सारने रद्द ठरविली. अनंत चतुर्दशीचा सरकारी बंदोबस्त काय वर्णन करावा? मंडईपासून तो थेट लकडी पुलाच्या पलीकडे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला हातात हात अडकविलेल्या शिपायांच्या रांगा बारा वाजल्यापासूनच खड्या उभ्या राहिल्या. गोरे हापसर त्या रांगांमधून गस्त घालीत होते.
तारखांचे ऐतिहासिक महत्त्व
गोरे सोजीर आणि जिल्ह्याजिल्ह्यांतून आणलेल्या पोलिसांच्या पलटणीच्या बंदोबस्तात सन १९२५ या पुण्याचा गणेशोत्सव निर्विघ्न पार पडला खरा, पण एवढा अटोकाट विराट बंदोबस्त केला कशासाठी? काय पुण्यावर जर्मनांची स्वारी आली होती? टिळकांना हद्दपारीची शिक्षा होताच मुंबईचा दरोबस्त गिरणीकामगार उचवताळून उठला, त्यावेळी मशीनगनांची जरूरी पडली नाही. रौलट अक्टाच्या `काळ्या रविवार`च्या आक्राळविक्राळपणावर गोऱ्या सोजिरांच्या पलटणींची गरज पडली नाही. नॉनकोऑपरेशनच्या युगात सरकारच्या उच्चाटनाची व कायदेभंगाची भाषा सर्रास बोकाळली, तेव्हाही नगर-सोलापूरच्या शिपायांच्या पलटणी धावून आल्या नाहीत. पण या गणेशोत्सवात चीड चिथावणीला मूळ कारण कोणते? तर ज्योतिराव फुल्यांचा पुतळा बुधवारात उभारण्याचा केशवराव जेध्यांचा ठराव! आज ही हकिकत वाचताना पुष्कळांना आश्चर्य वाटेल, हसू येईल कदाचित `खरोखरच असे पुण्याला घडले असेल काय?` असाही शंकेचा प्रश्न ते टाकतील. पण मी कथन करीत असलेली घटना माझ्या डोळ्यांसमोर घडलेली म्हणून निर्भेळ सत्य आहे.
घडणाऱ्या प्रत्येक घटनेला काही ना काही ऐतिहासिक परंपरेचा पार्श्वभाग असतो. असा माझा विश्वास आहे. मऱ्हाठी इतिहासाचा हयातभर व्यासंग केल्यामुळेही ही भावना बळावली असेल. इतिहासाला पुराव्याचे पाठबळ अगत्य असते. प्रस्तुतच्या पुणेरी गणेशोत्सवाच्या हडेलहप्पी धामधुमीलाही जुन्या ऐतिहासिक घटनेच्या परंपरेचा पुरावाच देतो, म्हणजे झाले. सन निराळा, घटना निराळी, पण तारखा बिनचूक. त्यातले मूळ कारणही एकाच मनोवृत्तीतल्या द्वेषाचे नि कारस्थानाचे.
३१ ऑगस्ट, १ सप्टेंबर आणि ४ सप्टेंबर या तीन तारखा महाराष्ट्राच्या स्वराज्यविषयक जीवनक्रांतीत अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ३१ ऑगस्ट १८३९ रोजी पुण्यात पोलिसांची आणि लष्कराची अशीच एकदम उठावणी झाली. १ सप्टेंबर रोजी १११ ग्रेनेडिअरची २५ वी पलटण साऱ्या पुण्याला आपला हडेलहप्पी दरारा दाखवून साताऱ्याकडे क्विकमार्च करीत गेली. ४ सप्टेंबरला दुपारी २ वाजता साताऱ्याला येऊन दाखल झाली. सायंकाळी ७ वाजता राजवाड्याला वेढा दिला आणि रात्री १२ वाजता छत्रपती प्रतापसिंहाला गाढ झोपेतून उठवून कैद व हद्दपार केले.
बरोबर ८६ वर्षांनी सन १९२५ साली पुण्यात त्याच इतिहासाची पुनरावृत्ती घडली. ३१ ऑगस्ट रोजी जेधे-जवळकरांचा छत्रपती मेळा निघणार म्हणून जिल्ह्याजिल्ह्यांतून आणविलेल्या पोलीसपार्ट्यांची धामधूम पुण्यात उसळली. १ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन. त्या दिवशीची कडेकोट जय्यत तयारी काय विचारता! जिकडे पहावे तिकडे हत्यारबंद पोलीसच पोलीस. मंडईपासून तो थेट लकडी पुलापलीकडे अश्वारूढ गोरे हपसर इकडून तिकडे भराऱ्या मारीत होते. छत्रपती मेळ्याची सारी पदे रद्द केल्यामुळे, तो नुसत्या बॅंडवर `सारा नकट्यांचा बाजार` या लोकप्रिय पदाचे सूर वाजवीत मुकाट्याने बाहेर पडलेला पहाताच, त्याच्या भोवती एकदम शिपायांनी गराडा घातला आणि गराड्यातच मेळा चालू झाला. ४ सप्टेंबर रोजी पुणे मुन्सिपालटीने फुले पुतळा प्रकरणात त्या महात्म्याच्या चरित्र-चारित्र्याची अर्वाच्य भाषेने गाजविलेली कत्तलकी रात. सन १८३९ सालची घटना १९२५ साली यथातथ्य उमटली. याचा अर्थच असा की कितीही काळ लोटला तरी ठरावीक पिंडप्रकृतीच्या जमातीत वखवखलेली दुष्टाव्याची भावना या ना त्या रंगाढंगात पिढ्यान् पिढ्या रेंगाळत असते.
काट्याचा नायटा केला -
फुले-पुतळा प्रकरणाची होळी विझते न विझते इतक्यात आप्पा बळवंत चौकात एक नेहमीचीच घटना घडली. रोमिओ प्रकरणे काही अलिकडचीच नव्हेत. सर्वत्र नेहमीच होत असतात. सध्या त्यांना विशेष ऊत आला आहे इतकेच. दुर्गाबाई नावाची एक ब्राह्मण तरुणी रस्त्याने जात असताना एका रोमिओने तिच्या खांद्यावर हात ठेवला नि तो पळालाही. बस्स! विझत आलेल्या होळीच्या ठिणगीने पुन्हा भडका उडवला. तो रोमिओ बामणेतर होता म्हणे. या एका मुद्यावर `बामणेतरांनी बामण स्त्रियांवर दिवसाढवळ्या हल्ले करण्याचा कट रचला आहे, सर्वांनी सावध राहून आपापल्या घरादाराची अब्रू सांभाळावी`, असा एकच हलकल्लोळ उडाला. त्याच सायंकाळी शिवाजी मंदिरात अखिल बामणांची एक विराट सभा घेण्यात आली. बामणांच्या टोळ्याच्या टोळ्या गल्लीबोळातून धिःकाराच्या गर्जना करीत सभास्थानाकडे जाऊ लागल्या.
माझे बिऱ्हाड नि छापखाना सदाशिव पेठेत. मग काय! नारायण सदाशिव पेठेतल्या आबालवृद्ध ब्रह्मवृंदांनी माझ्या छापखान्याकडे जोरजोराने हातवारे करीत फाल्गुनी ऋचांचा भडिमार सारखा चालू केला. एका बामण पठ्ठ्याने झाडाची भक्कम फांदी आणून, छापखान्याच्या पाटीवर धडाधड घाव घालून ती खाली पाडली. हा प्रकार सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत म्हणजे सभास्थानी टोळकी जाऊन पोहोचेपर्यंत चालला होता. त्या खुनशी मंडळींना शुक्रवारात जाऊन बामणेतरी अड्डयावर तसली दंगल करण्याची छाती होईना, म्हणून त्यांना बामणी सदाशिव पेठेत ठाण मांडून बसलेल्या माझ्यावर - मी बामणेतर म्हणून - येनकेन प्रकारेण सूड उगविण्याचा खटाटोप करावा लागला.
यानंतर ७-८ दिवसांनी मी, प्रो. समर्थ, रुईकर वकील असे ४-५ जण पर्वतीच्या बाजूला फिरायला गेलो असता अचानक ३-४ जणांनी स. प. कॉलेजच्या बाजूने येऊन माझ्यावर लाठीहल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यावेळी माझ्या हातात वॉकिंग स्टिकची गुप्ती होती. सळकन ती बाहेर काढून उगारताच, ते मर्दभ्याड खाचराच्या गवतातून पसार झाले.
हवे ते करून ठाकऱ्याचा काटा पुण्यातून उखडून काढायचा, हा हेतू परंपरेच्या काही ठरावीक विकल्पाने पछाडलेल्या काही बामण वीरांत सारखा फणफणत होता.
दि. ब. गोडबोल्यांची अॅटहोम पार्टी -
पुण्यात कोऑपरेटिव सोसायट्यांची एक परिषद भरली होती. त्या सुमाराला एक दिवस सकाळी एक ब्राह्मण तरुण त्या अॅटहोम पार्टीच्या निमंत्रण पत्रिकांची छपाई नोंदण्यासाठी छापखान्यात आला. प्रबोधन छापखान्यावर बामण गिऱ्हाइकांचा बहिष्कार असताना, आज हा प्राणी कसा आला? असा `का?` व्यवस्थापकाला किंचितसा चाटून गेला. नाही असे नाही. पण गिऱ्हाईक आलेच आहे, तर त्याचे काम घेणे भागच होते. भाव ठरला, त्याने २ रुपये अॅडवान्स दिले. संध्याकाळी छपाईचा बाकी आकार भरून तो पत्रिका घेऊनही गेला.
ठरल्या दिवशी निमंत्रणातील वेळेप्रमाणे परिषदेचे पाहुणे एकामागून एक दि. ब. च्या वाड्यात येऊ लागले. प्रथम दोनचार असामी आले, तेव्हा दि. ब. ना विशेषसे काही वाटले नाही. नेहमीच अशी मंडळी त्यांच्याकडे या ना त्या कामासाठी येत असत. पण थोड्याच वेळात ५०-६० ची टोळी अंगणात जमा झाली, तेव्हा साहजिकच, "काय हो, एवढी मंडळी आज येथे कशाला आलात?" असा सवाल दि. ब. ना करणे भागच पडले. पाहुणेही अचंब्यात पडले. एकाने अॅटहोम पार्टीची निमंत्रणपत्रिका दि. ब. ना दाखविली. मग हो काय विचारता! म्हातारा विलक्षण संतापला. "कोणी केला हा पाजीपणा? जारे जा आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलावून आणा." वगैरे त्यांचे आकांडतांडव चालू झाले. फरासखान्यातून पोलीस अधिकारी आले. पत्रिकेची तपासणी करता तळाला `प्रबोधन छापखाना, ३४५ सदाशिव पेठ, पुणे` हा नावपत्ता मिळाला. झाले. या साऱ्या कुचाळीचा कर्ता ठाकरेच. दुसरा कोण असणार? अशी चिथावणी मिळताच, पोलिसांची धाड आमच्याकडे वळली. आम्ही त्यांना छपाईची ऑर्डर, त्यावरची सही, अॅडवान्सची पावती नि बाकी भरपोचीची पावती, छपाईचे काम मिळाल्याची गिऱ्हाईकाच्या सहीची पावती, वगैरे सर्व दाखविले. प्रबोधन छापखान्यावर पोलिसांची धाड आलेली पहाण्यासाठी सुमारे शंभर-दोनशे नारो सदाशिव शनवारे मंडळी तो तमाशा पहाण्यासाठी जशी जमा झाली, तसे शेजारीच आळीत रहाणारे बॅरिस्टर गाडगीळही माझ्या दिमतीला धावून आले. "ठाकऱ्यांचा यात संबंध काय? ऑर्डरप्रमाणे छपाई केली, पैसे घेतले. यात चुकले काय? आधीच ठाकरे यांच्यावर ब्राह्मण मंडळींचा कडवा दात आहे. त्यांपैकीच कोणीतरी ही संभावित कुचाळी केली असली पाहिजे. पोलिसांनी गिऱ्हाईकाच्या सहीवरून तो मिश्चिफमॉंगर कोण, ते काढावे हुडकून. ठाकऱ्यांना त्याची उपाधी कशाला?" असा स्पष्ट खुलासा बॅरिस्टर गाडगीळ यांनी करून तो प्रसंग निपटला. पुढे काय झाले ते मला कळले नाही.
आडनाव गोडबोले पण हेतू?
या भानगडीनंतर एक दिवस सकाळी ९-१० च्या सुमारास व्हिजिटकार्ड छपाईच्या सबबीवर गोडबोले नावाचे एक अपटुडेट गृहस्थ छापखान्यात आले. व्यवस्थापकांनी त्यांना टाइपांचे नमुने दाखवून मजकूर वगैरे मागितला. "मला ठाकरे यांनाच भेटायचे आहे. त्यांच्याशी मी बोलेन." वगैरे हट्टच त्यांनी धरला. मी माडीवर लेखन करीत होतो. तसे सांगताच, "द्या त्यांना पाठवून वर" असा निरोप पाठविला. ते आले. टेबलाजवळच्या खुर्चीवर बसले. काम काय विचारले तर बराच वेळ गृहस्थ काही बोलेच ना. सारखा माझ्या देहयष्टीची जणू टेहाळणीच करू लागला. नंतर छपाईबद्दल अडखळत अडखळत काहीसे सांगू लागला. इतरही काही विषयांवर बोलला नि १५-२० मिनिटांनी माझा निरोप घेऊन खाली उतरून गेला. हे सारे होईतोवर छापखान्याचे फोरमन श्री. वझे दरवाज्याच्या फळीआड गोडबोल्यांच्या अगदी पाठीशी दडून उभे असलेले मला दिसले. मी विचारले, कां हो इथे कां? वझे म्हणाले, "साहेब माहीत नाही तुम्हाला हा गोडबोले पुण्यातला एक सराईत गुंड आहे. नेहमी सहा इंची सुरा असतो त्याच्याजवळ. आम्ही त्याला छपाईची माहिती देत असताना त्याने सारखा वर येण्याचा हेका धरला, म्हणून मला संशय आला नि मी त्याच्या पाठोपाठ, पाऊल न वाजवता, इथे येऊन उभा राहिलो. त्याने थोडी हालचाल करायची होती, मग दाखवला असता त्याला इथेच इंगा."
दोन तीन दिवसांनी नेहमीप्रमाणे संध्याकाळी मी श्री. शंकर हरि मुळे यांच्या ग्रंथभांडारात बसलो असताना, सहज तेथे फरासखान्यातल्या एका ओळखीच्या सबइन्स्पेक्टरची गाठ पडली. त्यांना गोडबोले प्रकरण सांगताच, ते म्हणाले - "अहो, तो ब्लॅक लिस्टात आहे आमच्या. मला ही हकिकत सांगितलीत, बरे केले. सभ्यतेच्या नि लोकसेवेच्या बुरख्याखाली वावरणारे कितीतरी असले गुंड पुण्यात आहेत नि त्यांना नेहमीच आमच्या टेहळणीत ठेवावे लागतात."
शारीरिक दंडापेक्षा कायदेबाजीत ठेचला तर?
तोही यत्न करून पहावा, असा नारो सदाशिव शनिवारे ठरावीक कज्जेदलालांनी व्यूह रचला. जेधे-जवळकरांवरील खटल्यात मला गोवण्याचा कट सिद्धीला गेला नाही, पण तो पीळ मात्र यत्किंचितही ढिला पडला नव्हता. फुले-पुतळा प्रकरणाची वाफ थंड होत असतानाच, कज्जेदलालांचे एक निवडक कुटाळ मंडळ त्यावेळच्या एका कट्टर बामणेतरद्वेष्ट्या वकील महाशयांच्या म्होरकेपणाखाली थापले गेले. त्यांनीच फुले निंदेच्या शिमग्यात जबरदस्त शंखध्वनीचा कार्यभाग साजरा केला होता.
माझे सर्व प्रसिद्ध ग्रंथ, प्रबोधनच्या उपलब्ध फायल्या जमवून, त्यात जाती-जातींत वैमनस्य फैलावणाऱ्या १५३-अ कलमाखाली येणाऱ्या मजकुराचे संशोधन करण्यासाठी ४-५ शहाणे वकील कामाला जुंपले. अजाणतेपणाने म्हणा किंवा अनवधानाने म्हणा, त्या कंपूत माझे स्नेही नि हितचिंतक बॅ. गाडगीळ यांचा समावेश करण्यात आला. माझ्याविरुद्ध कसले कारस्थान चालले आहे, याची त्यांनी लगोलग मला बातमी दिली आणि "मी आहेच त्यात. तेव्हा काय काय चालले आहे, ते वरचेवर कळवून तुम्हाला इषारा देईनच म्हणा", असा दिलासा त्यांनी मला दिला.
मलाही दंभस्फोट करता येतो म्हटलं!
पुण्यात मी फारसा कोणाकडे जात येत नसे. येणारे माझ्याकडेच येत असत. फुरसद सापडली तर संध्याकाळी सरळ श्री. शंकरराव मुळे यांच्या बुधवारातील दुकानात घटकाभर बसायचे नि बुधवार पेठेतून कोतवाल चावडीवरून तुळशीबागेकडे वळायचे. तेथे आयुर्वेदप्रवर नाना सासवडकर दवाखान्यात दिसला तर तेथे किंचित बैठक मारायची का तडक सदाशिव पेठेत आपल्या बिऱ्हाडी. बुधवार पेठेत कधीकाळी पंपूशेठच्या दुकानात शंकरराव मुजुमदार प्रभृती मंडळी बसलेली दिसलीच तर क्षणभर तिकडे वळायचे. हा माझा नेहमीचा क्रम. माझा पोषाख बहुधा हॅटबूट नेकटायी थाटाचा. त्यामुळे ठाकरे प्राणी अमुकच, असे पैजेने सांगणारे पुण्यात फारच थोडे.
साधारण १०-१५ दिवस झाले असतील नसतील. ठाकरे-वाङमयपाप-संशोधक पुण्यकर्मा कंपूचे कार्य अगदी नेटाने चालले होते. कंपूचे ठिकाण माझ्या बिऱ्हाडाच्या मागल्या आळीतच म्होरक्या वकिलांच्या बंगल्यात होते. आणि तेथे दररोज काय काय घटना घडतात, याचा रिपोर्ट मला बॅ. गाडगिळांकडून बिनचूक मिळत असे. पंधरवडाभर शब्दांचा नि अर्थाचा कीस काढला, पण कायद्यावर नेमके बोट ठेवून खटला भरता येईल, असे काही भांडवल हाती लागेना. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या चवथ्या अहवालात राजवाडे यांनी चांद्रश्रेणीय कायस्थ प्रभू समाजावर जो बदनामीकारक हल्ला चढविला होता, त्याला प्रत्युत्तरादाखल लिहिलेल्या `कोदंडाचा टणत्कार` या पुस्तकावर संशोधकी कंपूची सारी मदार होती. त्या पुस्तकात काहीतरी अवश्य सापडेल म्हणून कंपूने दस्ताभर कागदावर काही नोटस् तयार केल्या होत्या.
अखेर मुंबईहून एका नामांकित कायदा तज्ञाला निमंत्रणात आले. एक रात्रभर चर्चा चिकित्सा झाल्यावर, "या प्रकरणात तुम्हाला ठाकरे यांच्याविरुद्ध काहीही करता येणार नाही. प्रथम ऑफेन्सिव कोणाची? तर भा. इ सं. मंडळ आणि राजवाडे यांची. त्यातली भाषा नि मुद्देच इतके ऑफेन्सिव अँड डिफेमेटरी आहेत की त्यांना प्रत्युत्तर देताना ठाकरे यांनी वापरलेल्या भाषेपेक्षाही जहरी भाषा वापरली असती, तरी डिफेन्सिवच्या मुद्याखाली ती क्षम्य ठरणे प्राप्त आहे." झाले. कुटाळ कंपूच्या नाड्याच थंड पडल्या.
ही बित्तबातमी माझ्या संजयाने रातोरात मला श्रुत केल्यावर, मी एक डाव रचला. दुसऱ्या दिवशी सकाळी मळकट पंचा, तसाच सदरा, साडेतीन आण्यांची टोपी अशा थाटात माझे सगळे ग्रंथ नि प्रबोधनाच्या फायल्यांचा रुमाल घेऊन महोरक्या वकिलाच्या बिऱ्हाडी गेलो. "खानदेशातील भडगाव येथून आलो आहे. माझे नाव औदुंबर त्र्यंबक वाळिंबे. त्या हरामखोर ठाकऱ्याच्या पुस्तकातील नि त्याच्या त्या ब्रह्मद्वेष्ट्या प्रबोधनातील, फौजदारी खटला करता येईल असे, निवडक उतारे पुराव्यासह घेऊन मुद्दाम भेटायला आलो आहे." असे सांगताच मला वकिलसाहेबांच्या खास दालनात प्रवेश मिळाला. त्यांनी लगेच एका नोकराला सायकल घेऊन काही संशोधक वीरांना बोलवायला पाठविले. तोवर वकीलसाहेब आपल्या इतर कुळांबरोबर बातचीत करीत बसले. अर्ध्या तासात कंपू जमला. मी त्यांना एकेक पुस्तक उघडून त्यातले पॅरेग्राफ वाचून दाखवीत त्यावर आक्षेपांचे प्रवचन करीत होतो. तेही अगदी तन्मयतेने माझे त्वेषाचे प्रवचन ऐकत होते. इतुक्यात काय वर्तली माव! बॅ. गाडगीळ तेथे आले नि "काय केशवराव, आज इकडे कसे?" म्हणताच सारे चमकले. "म्हणजे? हे कोण केशवराव?" म्होरक्याने पृच्छा केली. गाडगीळ खदखदा हसत म्हणाले - "अहो, हेच ते प्रबोधनकार केशवराव ठाकरे." सारेजण `कॅपिटल ओ` सारखे तोंड वासून माझ्याकडे बघतच राहिले. म्होरकेश्वर अखेर उद्गारले : मोठ्या छातीचा इसम दिसतो हा!
मी : तसं काही नाही वकीलसाहेब. पाहिलं, सिंहाच्या गुहेत घुसून त्याची आयाळ निदान कुरवाळता तरी येते का नाही. बरं घेतो आपली रजा. आता ओळखलंत ना मी कसा आहे तो!
ट्रस्टींची भांडणे नि टिळक बंधू
मी पुण्यात पाऊल टाकल्यापासून (सन १९२५) कर्मठ बामण मंडळी माझ्याकडे जरी दुःस्वासाने पाहू लागली तरी काय योगायोग असेल तो असो! अगदी पहिल्याच दिवशी बापू टिळक आपणहून मला येऊन भेटला. मागस बहुजन समाज आणि प्रामुख्याने अस्पृश्य समाज यांच्या उत्कर्षाविषयी त्याने आपली कळकळ मनमोकळी व्यक्त केली. त्याच क्षणाला बापूचा आणि माझा आत्यंतिक जिव्हाळ्याचा जो संबंध जुळला तो त्याच्या दुर्दैवी अंतापर्यंत! त्यावेळी ट्रस्टी आणि टिळक बंधू यांच्यात तीव्र स्वरूपाची वादावादी, बाचाबाची आणि प्रसंगी धक्काबुक्कीपर्यंत प्रकरणे चालली होती. अरसपरस फिर्यादींचे सत्र चालू होते. वाड्यातल्या `राजकारणा`मुळे बापू नेहमी वैतागलेला असायचा. काही संतापजनक घटना घडली का तडक तो माझ्या बिऱ्हाडी धुसफुसत यायचा. खरे म्हणजे तो उसळला म्हणजे रामभाऊच त्याला "जा जाऊन बस ठाकऱ्यांकडे" म्हणून पिटाळायचा. पुष्कळ वेळा सकाळीच आला तर दिवे लागणीनंतर घरी जायचा. माझ्याकडेच जेवायचा आणि ग्रंथ वाचन करीत पडायचा. अर्थात वाड्यातल्या भानगडींची चर्चा माझ्याजवळ व्हायचीच. वारंवार तो म्हणे, "केसरी माझ्या हातात आला तर पुन्हा महाराष्ट्राला आगरकरांचा अवतार दाखवीन." बापूचा स्वभाव त्रासिक असला तरी फार सोशिक होता. पण रामभाऊचा स्वभाव वरवर जरी धिम्मा वाटला तरी `ऊठ सोट्या तुझं राज्य` हा प्रकार फार.
काय? टिळकांच्या वाड्यात अस्पृश्यांचा मेळा? अब्रह्मण्यम्!
टिळक बंधू धंदा अस्पृश्यांचा मेळा गायकवाड वाड्यात घेऊन येणार अशी भुमका पुण्यात पसरली. आणि ती खरीही होती. एकीकडे दंगलबाज छत्रपती मेळ्याची दहशत आणि त्यातच टिळक बंधूंचा हा उपद्व्याप! ट्रस्टी मंडळी भेदरून गेली. बामणेतर मंडळींच्या पाठिंब्याने रामभाऊ आणि बापू मनात आणतील ते करतील ही त्यांची खात्री असल्यामुळे, त्यांनी दोन मार्ग पत्करले. पहिला अस्पृश्य मेळा वाड्यात आणू नये असा मनाई हुकूम टिळक बंधूंवर बजावण्याचा जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज केला. असे मनाईचे कायदेकानून टिळक बंधूंनी बेधडक झुगारून फेटाळण्याचा आणि परिणामांना तोंड देण्याचा धीटपणा अनेक वेळा दाखविला होता. तो अनुभव लक्षात घेऊन ट्रस्टींनी दुसरी एक शक्कल काढली. फौजदारी प्रतिबंधाला ठोकरून त्या पोरांनी मेळा आत घुसवलाच, तर निदान गणपतीबाप्पाला अस्पृश्यांचा स्पर्श तरी होऊ नये, एवढ्यासाठी वाड्यातल्या गणपतीच्या मखराभोवती लोखंडी पिंजरा उभारून त्याला भलेभक्कम टाळे ठोकले. पण हे टाळेही फोडले तर? त्याचाही एक मनाई हुकूम ट्रस्टींनी मिळवून तो टिलक बंधूंवर बजावण्यासाठी बेलिफाला वाड्याच्या दरवाजावर आणून बसवला.
लोकमान्यांचा गणपती ट्रस्टींच्या तुरुंगात?
सकाळी एकदोन वेळा वाड्यात येऊन बेलिफाने रामभाऊ नि बापू यांना नोटीस घेण्याबद्दल विनंती केली. दोघांनीही "बाहेर बस, आत वाड्यात पाऊल टाकलंस तर याद राखून ठेव." धमकावून त्याला बाहेर घालवला. एकदा तर रामभाऊ त्याच्या अंगावर धावून गेला. सामोपचाराने बेलिफाला नोटीस लागू करता येणार नाही, असे दिसताच, ट्रस्टींपैकी एकाने कोर्टाकडे धाव घेऊन खुद्द नाझरलाच वाड्यात आणले. त्यांनी टिळकबंधूंशी शक्य तितक्या सभ्यतेने आणि शांततेने चर्चा केली. हा प्रकार गणपतीच्या पिंजऱ्याजवळच चालला होता. रामभाऊंनी एक मोठा हातोडा सदऱ्याखाली लपवून आणला होता. नाझर साहेबांचा कायदेबाजीचा सगळा वेदान्त ऐकल्यावर रामभाऊ ठासून म्हणाला - "अहो नाझरसाहेब, आमच्या थोर वडिलांची सारी हयात तुमच्या सरकारने तुरुंगातच खतम केली ना? आता त्यांच्या मृत्यूनंतर हे शहाणे ट्रस्टी त्यांच्या गणपतीलाही या तुरुंगात डांबतात? आम्हांला हे सहन होणार नाही, तुमची नोटीस ठेवा तुमच्या खिशात. आमचे काम हेच." असे म्हणून रामभाऊने ताडकन हातोड्याचा प्रहार करून पिंजऱ्याचे टाळे फोडले आणि सगळा पिंजरा उखडून दूर भिरकावून दिला. बिचारा नाझर काय करणार? आला तसा निमूट परत गेला.
याच दिवशी संध्याकाळी पांडोबा राजभोज यांचा अस्पृश्यांचा श्रीकृष्ण मेळा गायकवाड वाड्यात जाणार होता. वरील प्रकार झाल्यानंतर "मेळा बरोबर आणल्याशिवाय पुन्हा इकडे फिरकू नकोस. मी आहे येथे खबरदार", असे बजावून रामभाऊने बापूला माझ्याकडे जाऊन बसायला पिटाळले. घडल्या प्रकाराची साग्रसंगीत हकिकत बापूने सांगितली. सबंध दिवस तो माझ्याकडेच होता. संध्याकाळी दिवेलागणी होताच तो पुणे कँपात भोकर वाडीला गेला. रात्री ८ वाजता मेळ्याला घेऊन तो प्रबोधन कचेरीवर आला. तेथे सडकेवरच मेळ्याच्या गायनाचा कार्यक्रम झाला. सदाशिव पेठेसारख्या बामणी अड्डयात अस्पृश्यांच्या मेळ्याचा कार्यक्रम एक चमत्कारिक आकर्षणाची बाब होती. आजूबाजूला बघ्यांची खूपच गर्दी जमली. मेळा तेथून गायकवाड वाड्यात जाणार असा सगळीकडे बोभाटा झालाच होता. इकडे गायकवाड वाड्याच्या दरवाजावर दोन गोऱ्या सार्जंटांच्या आधिपत्याखाली पोलीस पार्टी अडसरासारखी उभी होती. रामभाऊ वाड्याबाहेर दरवाजासमोर एकटाच शतपावली घालीत फिरत होता. आमच्याकडून एक सायकलस्वार ५-५, १०-१० मिनिटांनी तिकडे फेऱ्या घालून रामभाऊच्या सूचना आणीत होता. "खुशाल या" असा रामभाऊचा सिग्नल मिळताच मेळा गाणी गात वाड्याकडे निघाला. रस्त्यांत बघ्यांची गर्दी उसळली. छत्रपती मेळ्याची मंडळीही वाड्यासमोर चंग बांधून तयार होती. मेळा गात गर्जत वाड्याजवळ येताच, बापू आणि रामभाऊ आघाडीला उभे राहिले. दरवाजाजवळ येताच पोलीसपार्टीने दरवाजाला आपले कूस घातले. एका सार्जंटाने दोन्ही हात पसरून "यू कॅनॉट एण्टर द वाडा" असा दम भरला. रामभाऊने एक मुसंडी मारून त्याला बाजूला सारले आणि पोलिसांची फळी फोडून तो आत घुसताच मेळेकर मंडळींनीही त्या मुसंडी पाठोपाठ वाड्यात प्रवेश केला. मेळ्याबरोबर बाहेरची इतर बरीच मंडळीही घुसली. त्या प्रचंड जनप्रवाहाला पाहून पोलीस नि सार्जंट बाजूला झाले. मेळा गणपतीसमोर जाऊन थांबताच पद्य-गायनाला जोरात सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास कार्यक्रम झाल्यावर, गुलाल प्रसाद वगैरे शिष्टाचार झाले आणि मेळा शांतपणे आला तसा बाहेर गेला. कार्यक्रम चालू असतानाही बिचारा कोर्टाचा बेलीफ दोनतीन वेळा नोटीसीचा कागद हालवीत बापूजवळ आला. त्याने त्याला हुसकावून बाजूला बसायला सांगितले. मेळा निघून गेल्यावर तो पुन्हा बापूजवळ आला. वास्तविक ज्या कामाची मनाई करण्यात आली होती ते काम तर झालेच होते. बापूने नोटिसीचा कागद हातात घेतला आणि टरटर फाडून टाकला.
मेळा गेल्यावर बापू आणि इतर ५-६ मंडळी प्रबोधन कचेरीत आली. हा शुक्रवारचा दिवस होता. मी चालू केलेल्या `लोकहितवादी` साप्ताहिकाचा अंक दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी बाहेर पडायचा होता. मेळ्याची सविस्तर माहिती देण्यासाठी शेवटचे ८ वे पान राखून ठेवण्याचे बापूने मला सांगितले होते. मंडळी छापखान्यात येताच बापूने झाल्या हकिकतीचा वृत्तान्त सांगितला आणि तो श्रीपतराव शिंद्यांच्या चिरंजिवाने (माधवरावने) लिहून काढला. कंपोझिटर्स तयार होतेच. मजकूर कंपोझ होऊन "गायकवाड वाड्यावर अस्पृश्यांच्या मेळ्याची स्वारी" या मथळ्याखाली सबंध पानभर हकिकत लोकहितवादी साप्ताहिकात छापून वक्तशीर बाहेर पडली.
बापूने आत्महत्या कां केली?
मनातली खळबळ, संताप आणि चीड सगळे गाठोडे विश्वासाने आणि मनमोकळेपणाने आणून ओतण्याचे, बापू टिळकाला अवघ्या पुण्यात मी आणि माझे बिऱ्हाड हे एकच ठिकाण होते. वाड्यात ट्रस्टी लोकांशी काही गरमागरम बोलाचाली, तंटाभांडण किंवा रामभाऊंबरोबर हातघाईचे प्रकरण झाले का बापू तडाड उठून माझ्याकडे यायचा. मध्यरात्रीसुद्धा. `पुणेरी राजकारणा`च्या कंकासाला कंटाळून पुण्याला रामराम ठोकून मी दादरला आलो नसतो, तर माझी खात्री आहे, बापूने आत्महत्या केलीच नसती. असत्य, अन्याय, अप्रामाणिकपणा त्याला बिलकूल सहन होत नसे. तो एकदम उखडायचा. त्याच्या कित्येक तक्रारी गंभीर असल्या तरी पुष्कळशा अगदी क्षुल्लक असत. त्यांचा पाढा तावातावाने त्याने माझ्यापुढे ओकला की धीराच्या नि विवेकाच्या चार उपदेशाच्या गोष्टींची मात्रा चाटवून मी त्याला शांत करीत असे. हरएक बऱ्यावाईट घटनेचे चक्र त्याच्या डोक्यात सारखे गरगरत असायचे. मनस्वी विचार करणाऱ्या मंडळींना मनातले विचार आणि भावना मोकळ्या करण्यासाठी एखादा स्नेहीसोबती आप्त जवळपास नसला, म्हणजे ते लोक मनांतल्या मनांत कुढू लागतात. असल्या कुढण्याच्या अतिरेकानेच बापू टिळकाची आत्महत्या ही दुर्दैवी घटना घडली!
प्रकरण १६
चरित्र भाऊरावचे नि खटला माझ्यावर
कूपरच्या कारखान्याला रामराम ठोकल्यानंतर भाऊराव पाटलाने सातारा येथे लहान प्रमाणावर शाहू छत्रपती बोर्डिंगची स्थापना केली. त्याचा सारा खर्च तोच कसा तरी भागवीत असे. अस्पृश्यांची मुले जमा करून त्यांच्या शिक्षणाची नि उदरनिर्वाहाची सोय लावण्याचे ते एकांडे शिलेदारीचे कर्म त्याकाळी जवळजवळ लोक-अमान्य किंवा विक्षिप्तपणाच्या सदरातच मोडत असे. हा लोकग्रह खोडण्यासाठी त्या कार्याच्या महत्त्वाची जाहिरातबाजी अवश्य होती. अर्थात भाऊराव हा कोण, त्याला या कार्याचे एवढे वेड लागण्याचे कारण काय, इत्यादी तपशिलांचा वृत्तपत्रांतून सर्वत्र पुकारा होणे अगत्याचे होते. महाराष्ट्रातल्या वृत्तपत्रांतून हमेशा पांढरपेशा नि त्यातल्यात्यात बामण मंडळींचा धौशा गाजत असायचा. बामणेतरादी मागस वर्गाच्या कामगिरीला त्यात स्थान नसायचे. माझ्या हातात त्यावेळी प्रबोधन मासिक आणि लोकहितवादी साप्ताहिक होते. त्यांतून भाऊरावाच्या कार्याचा डंका पिटण्याचे कार्य मी हाती घेतले.
प्रबोधनच्या एका अंकात भाऊराव पाटीलांचे समग्र स-फोटो चरित्र मी छापले. त्यात, तो कोल्हापूरला असताना, व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याला डांबर फासण्याचे प्रकरण कसे उद्भवले, त्यात अण्णासाहेब लठ्ठे यांना अडकविण्याचा दरबारी मनसुबा कसा ठरला, लठ्ठ्यांविरुद्ध साक्ष देण्यासाठी भाऊरावाचा कसा पोलिसी छळ झाला, त्या छळाला कंटाळून त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा कसा धाडसी यत्न केला, वगैरे मजकूर छापण्यात आला. त्यावेळी (सन १९२५-२६) कै. राजाराम महाराज छत्रपतींची कारकीर्द चालू होती आणि शाहूच्या अमदानीत खप्पा मर्जी झालेले अण्णासाहेब लठ्ठे कोल्हापूरचे दिवाण झाले होते. प्रबोधनचा तो अंक बाहेर पडताच भाऊरावाच्या अंत्यजोद्धाराची तळमळीची कथा जशी सर्वत्र चमकली, तशी कोल्हापुरी राजकारणी क्षेत्रातही बरीच गडबड उडाली. करवीर दरबार आणि मुंबई सरकारात काहीतरी पत्रापत्री अथवा तारातारी झाली. विस्मरणाची जाडजूड खरपुडी बाजलेल्या गळवावरची खपली, त्या चरित्र-प्रकाशनाने साहजिकच ओरखडून काढल्यामुळे संबंधितांची झोप उडणे क्रमप्राप्तच होते.
पुणे कलेक्टराचे मला निमंत्रण
एक दिवस पहातो तो एका पोलीस शिपायाने लांबरुंद खलिता आणून माझ्या हातात दिला, नि पोचल्याची सही घेतली. मी त्याला थांबवून लखोटा फोडला. त्यात, `अमूक तारखेला आपण मेहरबान कलेक्टर साहेब बहादुर मि. बॉल यांना तुमचा जाब देण्यासाठी येऊन भेटावे`, असा त्रोटक मजकूर होता. जाब? कशाचा? काहीच खुलासा होईना, तात्काळ टाईपरायटर उघडून, `कशाबद्दल जाब हवा त्याचा खुलासा करावा`, अशा मजकुराचे पत्र टायपून त्या शिपायाबरोबर पाठविले. ३-४ तासांतच तो उत्तर घेऊन आला, `श्री. भाऊराव पाटलांच्या चरित्रात तुम्ही छत्रपती शाहू महाराज यांची निंदा केली आहे, त्याचा जाब तुम्हाला द्यायचा आहे.` मनात म्हटले, अरेच्चा, या भाऊराव पाटलाची आजवर कोणी फारशी दाद घेतली नाही, पण आज मायबाप सरकारच्या प्रतिनिधीने घेतली. भाग्यवान आहे बेटा! साताऱ्याला भाऊरावाला हे कळविणे शक्य नव्हते.
कारण भेटीचा दिवस लगेच दुसरा होता. तरीही त्याला कार्ड लिहिलेच. त्यावेळी बामण-बामणेतर वादाच्या हंड्या पुण्यात उकळत होत्या. बामणेतरी पत्रांच्या संपादकांना मुद्दाम बोलावून, त्यांना सरकारी हडेलहप्पी धमकावण्या देण्याचा क्रम चालू होता. विजयी मराठ्याचे संपादक श्रीपतराव शिंदे, मजूर पत्राचा लाड वगैरे मंडळींना खास सरकारी इषारे लाभले होते. श्रीपतरावाने तडकून उत्तरे दिली, पण बिचारा लाड (नावाचा संपादक, पण होता साधासुधा कंपाझिटर.) हात जोडून परतला होता. आता माझी परीक्षा होती.
साहेबाचे कान चिटणिसाच्या हाती
मि. बॉल कलेक्टरसाहेब साहेबी मराठी बोलत नि त्याला ती भाषा (साधीसुधी व्यवहारी, ग्रांथिक नव्हे) समजत असे. पण सारा भाषिक पांडित्याचा दिमाख त्याच्या बामण चिटणिसाचा. तोच बहुतेक वटवट करीत होता.
मी : छत्रपती शाहू महाराजांची बदनामी कशी केली? याचा पुरावा काय? भाऊराव पाटलाच्या चरित्रात त्यांचा संदर्भ प्रामुख्याने येणारच. मी लिहिलेल्या हकिकतीचा पुरावा खुद्द भाऊराव पाटील द्यायला तयार आहे. त्याला बोलवा. शिवाय, या तक्रारीचे मूळ कोणाचे? करवीर दरबारचे असेल तर प्रिंसेस प्रोटेक्शन अॅक्टखाली हिंदुस्थान सरकारकडून तुमच्याकडे ही तक्रार आलेली आहे काय? तशी नसेल, तर मुंबई सरकारला यात मला जाब विचारण्याचा अधिकार काय?
बॉल : वेल मि. ठाकरे, आमच्याकडे ओरिएंटल ट्रान्सलेटरचा तुमच्या लेखाचा इंग्रजी भाषांतराचा तक्ता आला आहे आणि आम्हाला चौकशी करण्याचा हूकुम आलेला आहे.
मी तो भाषांतराचा तक्ता मागितला, पाहिला आणि "हे पहा साहेब, हे भाषांतर चुकीचे नि खोडसाळ आहे." असे सांगून काही वाक्यांची भाषांतरे कशी भलतीच केली आहेत, ते दाखविले. यावर माझी नि त्या चिटणिसाची काही शब्दांच्या भाषांतरावर चांगलीच जुंपली. "या प्रकरणात सर्व सूत्रे महाराजच चाळवीत होते", या वाक्याचे भाषांतर, "Maharaja was the wirepuller of this affair." असे केलेल दाखवून, त्यातील `वायरपुलिंग` या शब्दाने अर्थाचा कसा अनर्थ केला आहे नि खोडसाळपणाची कीड घातली आहे, हे सिद्ध करण्यासाठी, "सर लेस्ली विल्सन मुंबई इलाख्याची सूत्रे चाळवीत आहेत", या वाक्याचे भाषांतर "Sir Leslie Wilson is the wire puller of Bombay Residency." असे केले तर चालेल काय? असा सरळ सवाल टाकताच, बॉलसाहेब गडबडला नि चिटणिसाच्या तोंडाकडे पाहू लागला. आणखीही अशीच ५-६ वाक्ये दाखविली. अखेर बॉल म्हणाला - "हे पहा मि. ठाकरे, आमच्याकडे फक्त हे भाषांतर आले आहे, आणि त्यावर तुमचे म्हणणे काय आहे तेवढे वर कळवायचे आहे." मी भाऊरावाचे चरित्र का छापले, त्यातल्या हकिकती नि सध्याच्या करवीर दरबारातल्या काही उतुंगशिखरस्थ अधिकाऱ्यांच्या नाकाला मिरच्या कशा झोंबल्या असाव्या याचा स्पष्ट खुलासा केला.
बॉल : बरे, तुमचा पुढला अंक केव्हा बाहेर पडणार आहे?
मी: अंक छापून बहुतेक तयार आहे. ३-४ पाने छापायची राहिली असतील.
बॉल : बरे तर, तुम्ही आजचा आपला इण्टरव्यू तपशीलवार येत्याच अंकात छापा म्हणजे झाले. माझी समजूत आहे की मि. लठ्ठे यांना तुम्ही उकरून काढलेल्या जुन्या हकिकतीने वाईट वाटले असावे आणि त्यांनी परवाच्या अॅग्रिकल्चरल एक्झिबिशनला गव्हर्नरसाहेब आले असता, त्यांना काही सांगितले असावे, त्यावरून ही तक्रार निघाली असावी.
मी : पण त्या डांबर प्रकरणात लठ्ठे यांचा काहीच संबंध नव्हता, आणि म्हणूनच भाऊरावाने कठोर पोलिसी छळ सोसूनही त्यांच्याविरूद्ध खोटी साक्ष देण्यास साफ नकार दिला. याची जाणीव लठ्ठे यांना का नसावी, कळत नाही. तसे म्हटले तर लठ्ठे माझेही अगदी जानी दोस्त आहेत. सत्यशोधकीय सामाजिक सुधारणेच्या अनेक क्षेत्रांत आम्ही खांद्याला खांदा भिडवून कामेही केलेली आहेत. सध्याही त्यांच्या माझ्या गाठीभेटी नि पत्रव्यवहारही होत असतो. शिवाय, ठाकऱ्याने शाहू महाराजांची निंदा केली, या अफवेवर माझा कट्टर शत्रूही (कोणी असेल तर) विश्वास ठेवणार नाही.
बॉलच्या सूचनेप्रमाणे मी प्रबोधनात मजकूर छापला आणि त्या अंकाची एक प्रत स्वतः कलेक्टर कचेरीत जाऊन मी त्याला दिली. या भेटीत मात्र बॉलने चहा मागवून माझा बऱ्याच गोडव्याने सत्कार केला. चांगले अर्धा तास आम्ही बोलत बसलो होतो. माझे पत्र मिळाल्यावरून त्याच वेळी भाऊराव पुण्यास आला. मी कलेक्टरकडे गेलो आहे, असे समजताच तो तेथे आला. मग आमचे त्रिकुटाचे पुष्कळ बोलणे झाले. सगळ्या शंकाकुशंकांचे स्पष्ट निरसन झाले. भाऊरावने बॉलला शाहू छत्रपती बोर्डिंगला भेट देण्याचे निमंत्रण दिले नि आम्ही घरी परतलो.
सरकारचे लक्ष वेधले पाहिजे
भाऊराव पाटलाने शाहू बोर्डिंगच्या कार्याचे रोप लावले. अशा कार्याकडे लोक सुरुवातीला फारसे लक्ष देत नसतात. काढला आहे एक उद्योग एका एककल्ली माणसाने, पाहू या काय होते ते, अशीच वृत्ती असणार नि होती. रोपट्याचा वृक्ष झाला म्हणजे मग दिवे ओवाळणाऱ्या मशालजींची भाऊगर्दी उसळते. प्रबोधनातल्या चरित्रामुळे, कोणत्याही कारणाने का होईना, पुण्याच्या कलेक्टरापर्यंत भाऊराव ही व्यक्ती कोण, याचे लोण तर पोचलेच होते. हेच लोण थेट मुंबईच्या वरिष्ठ प्रधानमंडळात नेऊन कसे पोहचवावे, याचा आम्हा दोघांत खल झाला.
थोड्याच दिवसांत कोरेगावला मामलतदार असलेल्या रा. ब. दुधुस्करांकडून कळले की (त्यावेळी) नव्याने निवडून आलेले सर चूनीलाल मेहता, मिनिस्टर, साताऱ्याच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि कोरेगावला त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. खुद्द साताऱ्यातही कूपर प्रभृती राजशालकांची मेहता सत्काराची धामधूम उडाली होती. सातारा-टू-पूना आणि पूना-टू-सातारा भाऊरावाच्या फेऱ्या माझ्याकडे सारख्या चालू होत्या. मिनिस्टर महाशयांना भेटायचे तर नुसते दोन हात जोडून भेटण्यात अर्थ कसला? भेटण्यापूर्वी आपल्या कार्याविषयी थोडक्यात ठळक माहिती छापून त्यांच्याकडे पाठविली, तर आयत्या वेळी नुसत्या नामोच्चाराने प्रस्तावनेचे कार्य सुटसुटीत साजरे होईल, अशा धोरणाने माझ्या लोकहितवादी साप्ताहिकात भाऊरावाच्या कार्याची माहिती देणारी तब्बल दोन पाने इंग्रजीत छापून प्रसिद्ध केली. त्याच्या प्रती गवर्नरापासून ते सातारा पुणे जिल्ह्यांच्या कलेक्टरांपर्यंत पाठवून दिल्या. सर चुनीलाल मेहता यांना रजिस्टरने प्रत पाठविली.
साताऱ्यात राजशालकांच्या सत्कारात सर मेहता गढले असताही त्यांनी, "हू इज धिस भाऊराव पाटील अॅण्ड व्हेरीज हिज बोर्डिंग?" (कोण आहे तो भाऊराव पाटील नि कुठे आहे त्याचं बोर्डिंग) अशी चौकशी केली. हस्तांजली जोडून समोर दंतपक्तींचे प्रदर्शन करणाऱ्या एकाने (ईश्वर, कोठे असलाच तर त्याला क्षमा करो!) "तो एका एकांड्या शिलेदारांचा उपदव्याप आहे", असा खुलासा करताच, जवळच असलेल्या रा. ब. काळ्यांनी तडकावले, "दट्टेवारी नेण्यासारखा तो उपद्व्याप नव्हे. आज तो चिमकुला ओढा आहे, पण सरकारनं नि लोकांनी वक्तशीर हातभार लावला, तर त्याची विशाल गंगा होण्याचा संभव आहे." मन भाऊरावचा शोध चालू झाला. रा. ब. दुधुस्करांच्या आग्रहावरून आम्ही दोघांनी कोरेगावला मुक्काम ठोकला होता. कारण, अखेरचा टप्पा तोच होता.
मिनिस्टरला निर्जळी लेमोनेड एकादशी
दुपारी दीड दोनच्या सुमाराला सर मेहता मिनिस्टर कोरेगावला आले. पहिल्या महायुद्धात शौर्य गाजविलेल्या नि व्हिक्टोरिया क्रॉस मिळविलेल्या लष्करी पेन्शनरांनी त्यांना खडी ताजीम दिली. दुधुस्करांनी एकेकाचा सर साहेबांना परिचय करून देताना म्हटले, (एका कुकरीवाल्या पेन्शनराकडे बोट दाखवून) "या मर्दगड्याने एका रात्री याच कुकरीने सात जर्मनांना यमसदनास पाठविले." त्यावर मेहता स्मितहास्य करीत महणाले, "ते गाढ झोपी गेलेले होते की काय?" यावर खूपच हास्याचा कल्लोळ उडाला.
येथे मात्र मेहतांनी भाऊरावची स्वतः चौकशी केली. त्याने बोर्डिंगची योजना इंग्रजीत समजावून सांगितली, "हो, बहुतेक हकिकत मी लोकहितवादी साप्ताहिकात वाचलीच आहे. तुमची योजना सरकारमान्य व्हायला अगदी योग्य आहे."
भाऊराव म्हणाला, "पण ती मान्यता माझ्यासारख्या फटिंगाला लाभणार कशी? अस्पृश्यादी मागस समाजांच्या शिक्षणोद्धारासाठी अंगाला राख फासून मी बाहेर पडलो आहे." त्यावर सर मेहतांनी ठराविक ठशाचे आश्वासन दिले.
कोरेगावला रा. ब. दुधुस्करांनी चहा बिस्कटाचा उपहार सिद्ध ठेवला होता. साहेबांनी हात तोंड धुण्यास पाणी मागितले. तेव्हा एकाने लेमोनेडची बाटली फोडून मेहतापुढे धरली. "सरसाहेब, आमच्या कोरेगावला एप्रिल मेच्या सुमाराला पिण्याच्या पाण्याचा अगदी खडखडाट उडतो. कसेबसे गढूळ पाणी मिळते. आपण ही शेजारचीच विहीर पहाना कोरडी ठाण पडली आहे. म्हणून आपल्या सरबराईसाठी हे लेमोनेड आणले आहे साताऱ्याहून" त्यावर पाण्याच्या प्रश्नावर चर्चा होऊन, ते दौरा-पुराण संपले.
बोर्डिंग धननीच्या बागेत गेले
एक दिवस भाऊराव पुण्याला आला नि डोळ्यांत पाणी आणून सांगू लागला की "बस्स आता कहर झाला. बोर्डिगातल्या पोरांची उपासमार टाळण्यासाठी बायकोने मंगळसुत्रातलं सोनं विकून प्रसंग निपटला. बोर्डिंगात आता पाऊणशेवर पोरं आहेत. जागा अतिशय छान मिळाली आहे. दरमहा ३५ रुपयांवर एक बाई स्वयंपाकाला ठेवली आहे. सध्या तेथे एक युरपियन गृहस्थ, अगदी संन्याशाच्या वेषात झोपडी बांधून रहात असतो. मुलांच्या बरोबर शेतीचे बागायतीचे काम करतो. माझ्या कार्याचे तो निरीक्षण परीक्षण करण्यासाठीच येऊन राहिला आहे." ही माहिती सांगून तो मला घेऊन साताऱ्याला आला. साताऱ्याला आलो म्हणजे माझा मुक्काम सराफ नारायणराव वाळवेकरांकडे सदाशिव पेठेत असायचा. मी धननीच्या बागेला भेट दिली. सर्व परिस्थिती समजावून घेतली. त्या तपस्वी गोऱ्या साधूला भेटलो. तेथील प्रशस्त वटवृक्षांच्या पारावर बसून मुलांच्या मेळाव्याला आत्मोद्धारावर प्रवचन दिले.
आमच्याबरोबर भीक मागायला कोण तयार?
शिक्षणाची सर्वांची सोय तर लागलेलीच होती निरनिराळ्या शाळांतून. मुख्य प्रश्न होता मुलांच्या निर्धोक मम्मंचा. लोकांकडे पैसा मागण्याचे कर्म किचकट, रोख पैसा देण्यापेक्षा धान्य मागितले तर सहसा कोणी नकार देत नाही. मूठ पसा काहीतरी झोळीत टाकतात. तेव्हा आम्ही दोघांनी झोळीयोजनेचा एक रात्रभर वाळवेकरांसह विचारविनिमय केला. दुसऱ्या दिवशी भाऊरावने ५-६ व्यापाऱ्यांकडून २५-३० रिकामी पोती आणली. वटवृक्षाखाली मुलांची सभा भरविली त्यांना योजनेचे महत्त्व आणि जरूरी समजावून सांगितली, "मी आणि भाऊराव तुमचे अण्णा ही गोणी घेऊन गावात धान्यासाठी भीक मागायला बाहेर पडणार आहोत. आमच्या बरोबर कोण कोण येणार?" असा स्पष्ट सवाल टाकताच, थोडा वेळ मुले काहीच बोलली नाहीत, कडाडून मी म्हणालो, "काय रे, बोर्डिंगात येण्यापूर्वी रोज आयत्या तयार ताटावरच दुपारचे बारा साजरे करीत होतात काय रे? भाकरीच्या सुक्या ओल्या तुकड्यासाठी भीक मागताना जन्म गेला आणि आत्ताच आला काय रे पांढरपेश्या मिजासीचा वेताळ तुमच्या अंगात?" इतके चमकावताच सारेजण हिरिरीने उभे राहिले. "हो हो, येतो सारे तुमच्या बरोबर. जिकडे आमचे आन्ना, तिकडे आम्ही."
मुलांच्या हातात पोती आणि आम्ही प्रत्येक मोहल्यात जाऊन "शाहू बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांना धान्य-दान करा" अशी जबरदस्त आरोळी देत होतो. घराघरातून अनेक महिला सुपात तांदूळ. डाळ, गहू, ज्वारी घेऊन भराभर बाहेर आल्या. मुलांनी पुढे जाऊन धान्य गोळा केले. धान्य व्यापाऱ्यांनी तर पोते अर्धपोते धान्य आणून हवाली केले. दीड दोन तासांत बोर्डिंगाला दोन महिने पुरेल असा धान्याचा साठा मिळाला. गावभर या योजनेची चर्चा चिकित्सा चालू झाली. कोणत्याही कार्यासाठी फंड जमा करणारे एका अर्थी भीकच मागतात ना? मग द्रव्याऐवजी धान्य मागितले, तर त्यात चुकले काय? फंडवाले आरोळ्या मारीत नाहीत. धान्यवाले आरोळ्या मारून लोकांना जाग आणतात. इतकाच काय तो फरक. बाकी कार्य एकरंगी एकशिंगी.
वाडिया कॉलेजच्या योजनेचे बातबेत
प्रबोधन कचेरीच्या माडीवर शिजले. प्रथमपासूनच फर्ग्युसन कॉलेजातील केशवराव कानिटकर, येवलेकर प्रभृती प्रोफेसर मंडळींचे येणे जाणे बहुतेक रोज संध्याकाळी होत असे. प्रो. अण्णासाहेब खाड्ये तर माझे निकटचे शेजारी नि स्नेही. पुढे जेव्हा काही प्रोफेसर मंडळींना आपले स्वतंत्र कॉलेज काढण्याची स्फूर्ती आली, तेव्हा त्यासंबंधी बातबेत ठरविण्यासाठी ते सारे बिनचूक दररोज प्रबोधन कचेरीच्या माडीवर जमायचे. पुढयात भत्त्याची रास (चणेकुरमुरे, शेंगदाणे, शेव, कांदे, मिरच्यांचे सर्वश्रुत मिक्सचर) आणि चर्चा चालू व्हायच्या. त्या कधी कधी रात्री ९-१० वाजेतीवर चालायच्या, अंदाजे ३-४ महिने या प्रोफेसरी पार्लमेंटाच्या चर्चा चिकित्सेचा लोणेरी खल झाल्यावर, काही मंडळी मुंबईला गेली आणि अवघ्या दोनच दिवसांत आनंदाची बातमी घेऊन परतली की कॉलेजसाठी वाडियाकडून अमुक लाख रुपये देणगी मिळाली म्हणून!
यांना देणग्या चटकन कशा मिळतात?
मला अजून नवल वाटते आहे की हे गोखलेपंथीय लोक एखाद्या कोट्याधिशाकडे बिनचूक जातात कसे आणि अवघ्या २४-४८ तासांत लक्षावधी रुपयांचा फंड आणतात कसे? त्यांनी शब्द टाकायची थांतड का हातात नोटांचे पुडके पडते. अगदी अलिकडची एक गोष्ट सांगतो. शिवजयंतीनिमित्त व्याख्यानासाठी मी नासिकला चाललो होतो. डब्यात शिरलो तो तेथे म्हणून टी. ए. कुळकर्णी बसलेले. "काय? कोणीकडे दौरा?" विचारताच, "नासिकला जातोय, आमच्या हंसराज प्रागजी कॉलेजासाठी सायन्सची एक नवी इमारत उभारायची आहे. फंडाची योजना घेऊन चाललोय." ते म्हणाले. नासिकला माझा मुक्काम अवघा दोनच दिवस झाला नि मी परतण्यासाठी नासिक स्टेशनवर आली. पहातो तो प्रिं. कुळकर्णीही मुंबईला परतण्यासाठी स्टेशनवर उभेच. "काय? झाले का काम?" अहो, आमचे काम व्हायचेच. एका लक्षाधीश व्यापाऱ्याने ३ लाखांची देणगी दिली."
मी : हे कसे काय जमतं बुवा तुम्हाला उमगत नाही. इतरांना हजार रुपये जमा करायचे तर शेकडो दारवंडे पुजावे लागतात. तरीही झोळी भरतेच असे नाही. मग लाख लाख रुपयांचे फंड तुम्ही चुरकीसरसे जमा करताच कसे?
कुलकर्णी : अहो, ते काही मोठे ट्रेड सीक्रेट नाही. दान मागणाराविषयी दात्याला संपूर्ण विश्वास हवा की हा चोख नि निर्मळ वर्तनाचा आहे. याने काही डोळ्यांत भरतील अशी विधायक कार्य केलेली आहेत. त्या कार्याचा जनतेला ठळक फायदेशीर उपयोग होत आहे. दान मागणाराचे सहकारीही तितक्याच कर्तबगारीचे नि दानतीचे आहेत. यांना पैसा दिला तर एका कवडीचीही उधळमाधळ न होता पै न पै नियोजित सत्कार्यालाच खर्ची पडेल. एवढ्या लौकिकाच्या पायावरच आजवर आम्ही असली मोठमोठी कार्ये पार पाडीत आलो आहोत. आम्हाला ऑन, गोखल्यांचे नाव सांगावयाचे असते, केशवराव, त्या श्रेष्ठ परंपरेला यत्किंचितही कुठे कधी आम्ही कलंक लागू दिलेला नाही. म्हणून शब्द टाकताच आमची झोळी एकाच दारवठ्यावर भरते. अहो, नासिकला हंसराज प्रागजी कॉलेजचा एवढा मोठा पिरॅमिड आम्ही वैराण जागेवर उभा केलेला पाहून, सायन्स शाखेच्या जादा इमारतीसाठी ३-४ लाख रुपये कोणीही सज्जन दाता देणारच आहे काय त्यात? आपला हात आधी स्वच्छ निष्कलंक असला म्हणजे समोरचा माणूस तेव्हाच शेखहॅण्डला सरसावतो. हे आहे सारे आमचे गुपित.
काय केशवराव तुम्ही किती देणगी देणार?
पुणे कॅण्टोन्मेण्टात कॉलेजासाठी बंगल्याची खरेदी वगैरे कामे झटपट उरकत गेली. कॉलेजच्या जाहिराती फडकल्या. विद्यार्थी-विद्यार्थिनींची प्रवेशासाठी झुंबड उडाली. मूळ संस्थापक प्रोफेसरांशिवाय इतर अनेक विद्वानांचा संग्रह होत गेला. ग्रंथसंग्रालय थाटले गेले. अण्णासाहेब खाड्ये प्रिन्सिपल निवडले गेले. त्यांचे नि माझे वास्तव्य समोरासमोर मध्ये फक्त रस्ता. एक दिवस सारी संस्थापक मंडळी माडीवर जमली असता, विनोदाने का होईना, पण खाचे म्हणाले, "काय दादा, वाडिया कॉलेजला तुमची देणगी किती?" क्षणभर मी बुचकाळ्यात पडलो. "अहो मी काय असा धनासेठी गेलोय लागून, तर देणगी मागता?" केवळ नुसती थट्टा आहे हो ही, इतर मंडळी एकसुरात उद्गारली. पण लगेच मी म्हणालो, "हे पहा, थट्टा सहज पचविण्याइतका मोही अव्वल थट्टेखोर आहे. हे तुम्ही जाणताच; पण जेव्हा मी आपली देणगी जाहीर करीन, तेव्हा सारे आऽ वासून पहातच रहाल."
यावर चांगले ४-५ महिने गेले. एक दिवस अण्णासाहेब खाड्ये अगदी सकाळीच चहा पीत असताना समोरच दिसले. "अण्णासाहेब, हिअर इज ए न्यूज फॉर यू." मी म्हटले चहाचा पेला हातात घेऊनच ते गॅलरीत आले. “वाडियाला माझी देणगी." अण्णासाहेबः व्हाट्स् इट? मी माझा संपूर्ण ग्रंथसंग्रह. कप हातातला तसाच ठेवून ते धावतच माझ्या माडीवर आले. गंभीर मुद्रा करून म्हणाले, “खरोखरच? छे! मला थट्टा वाटते. आर. यू. सीरियस? आय बिलिव्ह नॉट, के. एस. ठाकरे वेळी जान देईल पण ग्रंथ देणार नाही. ग्रंथ त्याचा प्राण." आणि ते खरेही होते. बुकबाजीचे माझे व्यसन पराकोटीला गेलेले होते. अनेक वेळा संसाराची हेळसांड करून मी ग्रंथांची खरेदी करीत असे. इतक्यात, `केशवराव` अशी जोरकस हाक खालून ऐकू आली, अण्णासाहेबांनी "वर या, वर या, नूलकरसाहेब" म्हणून प्रतिसाद देताच, (आमच्या अगदी शेजारीच असणारे) नुलकर वर आले.
"अहो ठाकरे आपला हा सारा प्रचंड ग्रंथसंग्रह वाडियाला देताहेत." अण्णासाहेब म्हणाले. "इम्पॉसिबल" नूलकर गंभीरपणे उद्गारले. "मला तर ही सारी थट्टा वाटते. अहो, नवीन ग्रंथ पाहिला का त्यासाठी हा मुंबईला जाऊन खरेदी करून आलेला आहे. अन् म्हणे, हा ग्रंथसंग्रह सोडणार? अट्टर्ली इम्पॉसिबल! अहो, ग्रंथ आहेत म्हणूनच हा जगतो आहे." मी आपण म्हणता ते सारे खरे आहे. पण पूर्ण विचार करूनच मी ही देणगी देत आहे. आज केवळ मीच या ग्रंथांचा आस्वाद घेत असतो. पण हिस्टरी, वैदिक लिटरेचर, फिलॉसफी यांवरील अनेक जुने नवे ग्रंथ त्या त्या विषयांच्या अभ्यासकांना कॉलेजात उपयोगी पडतील. येथे नुसत्या शेल्फवर ठेवण्यात अर्थ तो काय? खटारा आणा नि भरून घेऊन जा. सुमारे ३४ शे पुस्तकांचा संग्रह मी वाडियाला दिला. आजचा जो संग्रह आहे. ती माझ्या बुकबाजीच्या व्यसनाची नवी आवृत्ती. सबंध हयातील मी दोनच व्यसने करीत आलो आहे. एक तपकीर आणि दुसरे ग्रंथ. तरीही अगदी परवा नव्या संग्रहातला सारा इतिहास ग्रंथांचा संग्रह मराठी ग्रंथवाचनालयाच्या संशोधन विभागाला देऊन टाकला.
जुनाट दुर्मिळ इतिहासाची बाडे
मिळतील तेथे पैदा करण्याचा मी फार षोक केला. एकच दाखला. एकदा आजारी असताना पुणे मंगळवार पेठेत बंधू कै. यशवंतरावाकडे डॉ. खेडेकर एम.डी. यांची ट्रीटमेंट घेण्यासाठी राहिलो होतो. खिडकीत बसलो असता, रस्त्यावर एक पोरगी शेजारच्या वाण्याकडचा निळसर कागदावरचा गूळ चाटीत चाटीत चाललेली दिसली. तसाच धावलो खाली नि तिच्या हातातला तो कागद जवळ जवळ हिसकावूनच घेतला. पाहिला नि तसाच तो घेऊन त्या वाण्याकडे गेलो. “काय शेटजी, हे सरकारी कागद कसे आले तुमच्याकडे?" तसा तो लेकाचा घाबरला. तो ते बाड मांडीखाली दाबून धरून टराटर फाडतो आहे एकेक पान पुड्यासाठी. एक पावली देऊन मी ते बाड ताब्यात घेतले. पहातो तो ग्रँट डफच्या `हिस्टरी ऑफ द मऱ्हाठाज` या इंग्रजी ग्रंथाचे केपन याने मराठीत भाषांतर केलेले आणि इंग्लंडातच शिळा प्रेसवर छापलेले जाड नि निळ्या फुलस्केप कागदांचे जाडजूड बाड.
हिंदू जनांचा ऱ्हारा नि अधःपात
छत्रपती शाहू महाराजांनी अमेरिकेतल्या पेंशनैलिस्टिक सोसायटीचे विविध ग्रंथ मला उपलब्ध करून दिल्या दिवसापासून हिंदुस्थानात अशा विवेकवादी विचारांच्या संघटना कोठे कोठे आहेत. याचा मी सारखा तपास करीत होतो. समाजस्वास्थकर्ते कर्वे यांच्याशी सहज बोलता त्यांनी कलकत्याच्या इंडियन रेशनॅलिस्टिक सोसायटीचा पत्ता दिला, काय योगायोग पहा. कर्वे-भेट घेऊन दादरला परतत असताना, व्हीलरच्या स्टॉलवर `डिक्लाइन अॅण्ड फॉल ऑफ द हिंदूज` हे इंग्रजी पुस्तक आढळले. तात्काळ विकत घेतले. त्यावरील जाहिरातीप्रमाणे त्या सोसायटीच्या रॅशनल बुलेटीनची वर्गणी भरून, संस्थेचे नियम मागवून सभासद झालो.
प्रस्तुत `डिक्लाइन` पुस्तकातील निरूपण नि विचार थेट माझ्या आचार विचारांशी जुळते मिळते आढळल्यामुळे त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करण्याचा निर्धार केला. ग्रंथकार बॅं. एस. सी. बानर्जी, पाटणा (बिहार) यांच्याशी पत्रव्यवहार चालू केला. परिचय - संदर्भासाठी कलकत्याच्या `मॉडर्न रिव्हयू` मासिकाचे संपादक रामानंद चतर्जी यांचे नाव कळविले. रामानंदांचा आणि माझा समक्ष कधी जरी परिचय झालाच नाही, तरी पत्रव्यवहाराने तो चांगलाच वाढलेला होता. शिवाय `स्टोरी ऑफ सातारा` ग्रंथाचे लेखक मेजर बसू यांना, मुंबईत माझी भेट घेण्याबद्दल त्यांनीच शिफारस केली होती. ही हकिकत मागे आलेलीच आहे. बॅ. मुकर्जी यांनी रामानंदजीची समक्ष गाठ घेऊन, मराठी अनुवादाची विनामूल्य परवानगी मला लेखी पाठवून दिली.
कै. बापूसाहेब चित्रे- प्रबोधनचे सहसंपादक
पुण्यातील माझे जीवन अत्यंत धडाडीचे आणि विरोधकांशी बोकडी टकरा देण्यातच खर्ची पडत असल्यामुळे, प्रबोधनाचे मासिक प्रकाशन वक्तशीर करण्याचे आणि छापखान्याची व्यवस्था पहाण्याचे काम बापूसाहेब चित्रे विलक्षण आपुलकीने पहात असत. त्यानी आपण होऊन `डिक्लाइन`चे मराठी भाषांतर करण्याचे काम अंगावर घेतले. बापूसाहेब एलेल्बीच्या अखेरच्या परीक्षेला बसण्याची तयारी करीत होते, तरी जात्या त्यांचा पिंड अव्वल साहित्यिकाचा होता. भाषांतर जसजसे होत जाई तसतसे ते प्रबोधनात छापले जाई. हा क्रम काही महिने चालला असताना, एकाएकी बापूसाहेब चित्रे क्षयरोगाधीन झाले आणि उपायांची पराकाष्ठा करूनही अखेर दिनांक २८ मे १९२६ रोजी कल्याण येथे दिवंगत झाले. माझ्या साऱ्या व्यवहाराचा नि सार्वजनिक धडपडीचा उजवा हातच तुटला!
पुणेरी कारवाईचा और एक नमुना
प्रत्येक सुधारक चळवळीला जमीनदोस्त करण्याच्या कामी भिक्षुकशाही कधी नमते, कधी वाकते, तर कधी जुळते घेऊन जरा थोडी संधी सापडताच, एकदम उचल खाऊन एक दात पाडल्याचा सूड बत्तिशी ठेचून कसा उगविते, याचा अनुभव घेत घेत माझे पुण्याचे जीवन चाललेले होते. छापखान्याला बामणी चिथावण्यामुळे जॉबवर्क मिळतच नसे. जवळजवळ पिकेटिंगच होत असे म्हणाना. तेव्हा नवीन पुस्तकाचे लेखन प्रकाशन करून, त्याच्या उत्पन्नावर खर्चाची तोंडमिळवणी करावी लागत असे.
बापूसाहेबांनी अर्धवट भाषांतर केलेल्या पुस्तकाचे काम मी संपूर्ण पुरे केले २००० प्रती सुबक छापल्या. पुस्तकाच्या विक्रीवर कोलदांडा घालण्याची विरोधकांना शहामतच नव्हती. कारण माझे विश्वासू ग्राहक महाराष्ट्रभर पसरलेले असत. फर्मे छापल्यावर एका बाइंडरला बोलावून दोन दोन हजार प्रती आणि प्रत्येकी २५ चा वरताळा याप्रमाणे मोजून गठ्ठा त्याच्या हवाली बांधणीसाठी दिले.
आठ दिवसांत बांधीव पुस्तके आणून द्यायचा सौदा ठरला. चवथ्या दिवशी लेकाचा आला नि सांगू लागला "साहेब, ४-५ गठ्ठ्यांत कागद कमी भरतात. एकात १००, दुसऱ्यात सव्वाशे, तिसऱ्यात ७५." आश्चर्याने आ यवसून मी त्याच्या थोबाडाकडे पहातच राहिलो. "अरे, प्रत्येक गठ्ठा मोजून तुला २०२५ कागद दाखविले होते ना?" यावर जबाब काय? तर, "ते खरं साहेब पण कागद कमी भरतात."
हा चमत्कार कसा घडला? पुस्तकांचे फर्मे बाइंडरकडे बांधणीला गेले, म्हणजे त्यांच्या धडा घालण्यासाठी ते अनेक शाळकरी मुलांना घरोघरी देतात, त्यावर त्या मुलांना थोडी कमाई होत असते. ही मुले बहुशः बामणांचीच असायची. फर्मे घरी नेल्यावर साहजिकच घरची मंडळी ते वाचणार. आधीच पुस्तक ठाकऱ्याचे नि त्यात मिक्षुकशाहीवर एका बंगाल्याने घडविलेला हल्ला! मग हो काय! प्रत्येक गठ्ठ्यातले चांगले शेसव्वाशे कागद काढून जाळायचे नि बाकी गठ्ठा बाइंडरच्या हवाली करायचा. मग तो बोंबलत येणार नाही तर काय करणार? पण त्याच्या बावळट `बुधवारी` टाळक्यात ते कृत्रिम येणार कशाने? अखेर जेमतेम दीड हजार प्रती पदरात पाडल्या. बाकीचे शिलकी चवाळे `अग्नये स्वाहा इदं न मम` करून मोकळा झालो. पाचशे रुपयांचे नुकसान भोगावे लागले. पुस्तकाच्या विक्रीने संसार नि छापखाना सावरला, यातच समाधान मानले झाले.
हवा असेल तर हा माल मिळेल
परस्थ माणसाचे वूड पुण्यात टिकूच द्यायचे नाही, मग तो अगदी ब्राह्मण असला तरीही, त्याला उखडण्याच्या युक्त्या कशा नि कोणत्या लढवाव्या. या बाबतीतली कारवायांची परंपरा निदान नाना फडणविसाइतकी तरी खास जुनाट आहे. ज्या परस्थाजवळ गडगंज पैशांचा उबारा असेल, आपण बरे नि आपले पेन्शन बरे या वृत्तीचा तो पेन्शनर असेल, किंवा दणक्या वकील असेल, तरच तो पुण्यात टिकायचा. पुणेरी विंचवांची नांगी शहाजोग ठेचायला प्र. बा. जोगच लागतो. उभ्या महाराष्ट्राचे जगणे मरणे आमच्या इच्छामात्रेच होत आले. व्हावे नि होत रहाणार, असा एक दंभ म. गांधींनी तेथील पगडबंद राजकारण्यांच्या पगड्या हवेत उधळीपर्यंत, बराच बोकाळलेला होता.
समाजधर्म-राजकारणात आमचा शब्द म्हणजे वेदवाक्य, असल्या घमेंडीने फुरफुरलेल्या पुणेरी बामणांना बामणेतरी चळवळीने टोल्याला टोला हाणण्याचा तडाका चालू करताच, त्यांची माथी अर्थातच कडकणार, सामाजिक नि राजकीय विषमतेविरुद्ध माझी पाणी नि लेखणी एकलहरी असल्यामुळे, माझे प्रस्थान उखडण्यासाठी पुण्यात झालेल्या अनेक कारवायांत मला छपाईचा कागद मिळू न देण्याचीही एक कारवाई झाली. तेथे एकदोनच कागदाचे बामण व्यापारी होते. केव्हाही मागणी करा, ते प्रुफाचा पिवळट कागदच पुरवायचे, "अहो, रोख पैसा देतोय, मला चांगला पांढरा प्रिंटींग पेपर पुरवा की." यावर जबाब काय? तर म्हणे "तसला कागद आमच्याकडे नाही. हवा असेल तर हा घ्या." बरे, एखादा बामणेतर छापखाण्याकडे (तेही सारे बामणाळलेलेच) सफेद कागदासाठी मागणी केली, तर त्यांचेही कान आधीच पिरगाळून ठेवलेले. आहे कुठ आमच्याकडे कागद आहे. आहे तो आम्हालाच पुरत नाही. तुम्हाला कुठून द्यावा. हा त्यांचा खुलासा.
कागद पुरवठ्याच्या बाबतीत महाराष्ट्र शब्दकोश छापताना, प्रकाशक संपादक श्री. यशवंतराव दाते यांनाही ही बामणी नांगी कशी भोवली. याबद्दल त्यांनी अखेरच्या ७ व्या विभागाच्या प्रस्तावनेत खुलासा केला आहे. डेक्कन पेपर मिलचे मालक कै. शेट फर्टुनजी पदमजी यांनी देशी कागदाचा पुरवठा केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना श्री. दाते म्हणतात- "या गुजराथी बोलणाऱ्या पारशी गृहस्थांनी जी सहानुभूती आम्हास दाखविली, तिचा सहस्त्रांशही मराठी बोलणाऱ्या कागदाच्या ब्राह्मण व्यापाऱ्यांनी दाखविली असती तर आम्हास अधिक आनंद झाला असता."
संकटांच्या छातीवर चालून जावे
हे सुभाषित माझ्या पिंडप्रकृतीत अगदी जाम भिनलेले आहे आणि अनेक वेळा मी त्याचा यशस्वी प्रयोगही केलेला आहे. स्थानिक कारवाया चाललेल्या असतानाच, मी कोणाकोणाचे किती देणे लागतो, याचा तलास होत होता. अखेर अगदी मुद्याचा गड्डाच हाती लागला. छापखान्याच्या उभारणीसाठी मुंबईच्या ज्या गुजराथी व्यापाऱ्याकडून (गुजराथी टैप फौण्ड्री) मी यंत्रादी साहित्य खरेदी केले होते, तो अचानक गवसला. अंदाजे दहा हजार रुपयांचा माल मी खरेदी केला होता. पैकी दीडदोन हजार रुपये द्यायचे बाकी होते. त्याला चिथावून पुणे कोर्टातून एकदम छापखाना जप्तीचा हुकूम काढण्यात आला. एका सायंकाळी बेलिफाकडूनच मला ही बातमी समजली. तो गुजराथी खडकीला एका व्यापाऱ्याच्या बंगल्यात उतरल्याचा शोध घेतला. रात्री ९ च्या सुमारास मी आणि बापूसाहेब चित्रे टांगा करून त्या बंगल्यावर गेलो, दिवाणखान्यात वादी प्रतिवादी समोरासमोर आले. गुजराथ्याची सहाजिकच समजूत की मी त्याची गयावया करून त्याच्या पायावर लोळण घेण्यासाठी गेलो म्हणून.
मी : काय शेट, उद्या सकाळी तुम्ही माझ्या छापखान्यावर जप्ती आणणार असल्याची बातमी बेलिफाने मला संध्याकाळीच सांगितली. आजवर नाही नाही तरी आठ हजारांची फेड मी मुदतबंद केलेली आहे. बाकी असतील दीड दोन हजार.
शेट : फक्त तेरासो.
मी : तेवढ्यासाठी तुम्ही माझे तीनतेरा करायला पुण्याला धावून आलात? मीही काही मेल्या आईचे दूध प्यालेला नाही. हे पहा. सकाळी साडेआठवाजेपावेतो झोपण्याची मला सवय आहे. त्याआधी कुणी मला उठवलं तर त्याच्या नरडीचा घोट घेईन. तुमची जप्ती येणार उजडत सहा साडेसहाला. म्हणून ही घ्या छापखान्याची किल्ली. खुशाल दार उघडा, माल जप्त करा नि चालते व्हा. मला हाका बिका माराल, तर उठून प्रथम शेट तुझ्या नरडीला हात घालीन भर रस्त्यावर, याद राख. (मी जायला निघालो.)
शेट : (मला थांबवीत) हे पहा. केशवराव, रागावू नका. हमचे मनामंदी काय बि नवता. पन आमचे ते बामन दिवानजी हाय ना. तेनी बातमी दिली.
मी : त्याचे कान पुण्याच्या बामणाने चावले असतील.
शेट : ते बी खरा हाय, तेनी सांगितला के ठाकरेने सम्दा छापखाना इकायला काडलाय. गिराईक बी तयार हाय. तवा आमी जप्तीची लगबग नै करेल तो पैसा जाते. असा आग्रह झाला म्हनशी ए खटपटमंदी आमी पडले. नै तो हामी तुमाला काय पयछानते नै?
मी : पयछाना, पयछानू नका, मला गरज नाही. मी तुमचे देणे आत्ता साफ नाकारतो. करायचं असेल ते करून घ्या. रामराम.
अशी टरकावणी होताथ, यजमान गुजराथ्याने मध्यस्ती केली. त्याने मुंबईकर शेटकडून किल्ली माझ्या हातात बळेबळे कोंबली. मी परत आलो. दोनतीन दिवस झाले तरी जप्तीचा पत्ता नाही. त्या बेलिफाला भेटलं, "अहो, काय म्हणे, तुम्ही त्या गुजराथ्याला भक्कम रेचक दिलंत वाटतं? अहो, त्याने कालच फिर्याद काढून घेतली नि गेला निघून."
दगलबाज शिवाजी
वाचक कदाचित हे विशेषण शिवरायाला लावल्याबद्दल माझ्यावर गुरगुरतील. पण थांबा. ही मजेदार कथा तर आधी वाचा. १९२६ चा मे महिना चालू होता. वसंत व्याख्यानमाला जागोजाग फुलल्या होत्या. एक दिवस माझे स्नेही कै. गोपीनाथराव पोतनवीस आणि भोरचे शिवप्रेमी शेटेबंधू माझ्याकडे आले. "भोरला वसंत व्याख्यानमाला चालू आहे. तुमचे एक व्याख्यान यंदा तेथे व्हावे, यासाठी आमंत्रण द्यायला आलो आहो, विषय कोणता?"
मी : विषय ? दगलबाज शिवाजी.
एवढे शब्द ऐकताच शेटेबंधू दचकले. “काय हे केशवराव अहो, तुम्ही तर शिवरायाचे अट्टल भक्त अन् ही भाषा!"
मी : होय. म्हणूनच म्हणतो दगलबाज शिवाजी.
तिघांनी खूप खल केला. पण मी आपला हेका सोडला नाही. निराशेने तिघेही गाडी उतरून गेले. दोनच मिनिटांत गोपीनाथराव परत आले. "हे काय शिक्रीट आहे केशवराव?"
मी: अर्जून बगलबाज होता. कर्तव्याला बगल मारून पळत होता. पण शिवाजी तसा नव्हता. तो वाकड्या दराला वाकडी मेढ ठोकून समोर येईल त्या मुकाबल्याचा फडशा पाडणारा दगलबाज होता. `दगलबाज` नि `दगाबाज` यातील भेदच लोकांना समजत नाही. दगलबाज म्हणजे `डिप्लोमॅट` दगाबाज म्हणजे ट्रेचरस इरसाल मुत्सद्दी दगलबाजच असावा लागतो. कळले?
गोपीनाथरावांनी शेटेबंधूना वर बोलावले, आणि म्हटले, "बस्स, ठरलं, विषय दगलबाज शिवाजीच." ते बिचारे दोघे त्यांच्याकडे पहातच राहिले. "अरे गोपिनाथराव तू पण बाटलास? बरं, होऊन जाऊद्या तुमच्या मनासारखं भाषण ऐकणारे देतील न्याय. आमचं काय!"
भोर शहरात खळबळ उडाली
तेथील व्याख्यानमालेच्या बोर्डावर वक्ते:- प्रबोधनकार ठाकरे, विषय:- दगलबाज शिवाजी. असे खडूने लिहिण्यात आले. काही मंडळींना चीड आली. त्यांनी तो क्रम बदलून वक्ते:- दगलबाज ठाकरे, विषयः प्रबोधनकार शिवाजी असा दोन तीन वेळा बदल केला. व्यवस्थापकांनी लिहावे आणि चीडखोरांनी ते बदलावे असा प्रकार संध्याकाळपर्यंत चालला होता.
मेहेंदळे यांच्या बसमधून वक्ते महाशयांची स्वारी भोरला निघाली. कात्रजचा बोगदा ओलांडून मैलभर बस गेली असेल नसेल, तोच गडगडाट झाला. एकदम आकाशात काळे ढग जमा झाले. पाऊस धोधो कोसळू लागला. तशात एकाएकी बसगाडीही खटकून थांबली, आता? विचारा मेहेंदळे तसाच पुण्याकडे जोणाऱ्या एका गाडीने, "एका तासात दुसरी बस घेऊन येतो", म्हणून सांगून गेला. आम्ही सारे बसलो पावसाचा तडाखा सोशीत. सगळे भिजून चिंब झाले. खरोखर एक तासातच नवी गाडी आली. व्याख्यान सायंकाळी ७ चे आम्ही तेथे ओले चिंब अवस्थेत गेलो ९ वाजता श्रीराम मंदिराच्या सभामंडपात सभा भरली. गर्दी चिक्कार. जाहिरातच तशी झाली होती ना! दीड तास व्याख्यान झाले.
बगलबाज अर्जुन नि दगलबाज शिवाजी
छत्रपती शिवरायाच्या समग्र चरित्रातील त्याच्या ठळक पराक्रमांच्या घटनांवर, दर प्रसंगी वाकड्या दरात वाकडी मेढ कशी ठोकून त्याने मुकाबल्यांचा फडशा पाडला. याचे तात्त्विक विवेचन भरपूर केल्यावर व्याख्यानाचा समारोप मी कसा केला-
"बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी या तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समरभूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझुलखानासमोर उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली तर, अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो. काका, मामा, आप्पा, बाबा यांना कसे मारू या क्षुद्र कल्पनेला बळी पडून, विहित कर्तव्याला बगल मारून पळू पहाणारा बगलबाज अर्जुन पहा. आणि भेटीचे ढोंग करून दगा द्यायला आलेल्या दगाबाज खानाला युक्तीने गारद करणारा कर्तव्यतत्पर सवाई दगलबाज शिवाजी पहा. म्हणजे कर्तव्याकर्तव्याचे कोडे थोडे तरी सुटेल. खानाला ठार मारल्याशिवाय किंवा त्याच्या हाती शिवाजी जिवंत किंवा मेलेला सापडल्याशिवाय, त्या मुकाबल्याचा निकालच लागणारा नव्हता. अर्थात मारीन किंवा मरेन. असा अटीतटीचा सामना देण्याच्या तयारीनेच शिवाजी प्रतापगड चढला आणि त्याच्या लोकोत्तर प्रसंगावधानाने त्याने अशक्य घटना शक्य करून दाखविली.
हिंदवी स्वराज्याच्या प्राणप्रतिष्ठेसाठी स्वतःचा प्राण देणे अथवा खानाचा प्राण घेणे, यापेक्षा तिसरा मार्गच शिवाजीपुढे नव्हता. ते कर्तव्य त्याने मोठ्या कुशलतेने पार पाडून, "योगः कर्मसु कौशलम्" या गीतोक्तीप्रमाणे `दगलबाजातील योगीराज` (ए सुप्रीम डिप्लोमॅट) ही आपली कीर्ती अजरामर केली. श्रीकृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला, पण ती प्रत्यक्ष आचरणात आणून महाराष्ट्राचा राष्ट्रधर्म भगवद्गीतेत आहे. हे सप्रमाण सिद्ध केले दगलबाज शिवाजीने, बगलबाज अर्जुनाने नव्हे. गीतेचे पांग पांडवांनी फेडले नाहीत, तर शिवाजीने फेडले. महाभारतीय इतिहासाला आपल्या बुद्धिप्रभावाने रंगवून चिरंजीव करणाऱ्या दगलबाज श्रीकृष्णाला बगलबाज अर्जुनापेक्षा दगलबाज शिवाजी हाच खरा शिष्य नि अनुयायी लाभला, यात मुळीच संशय नाही. अर्थात यत्र योगेश्वरः कृष्णः श्लोक यापुढे-
यत्र योगेश्वरः कृष्णः यत्र शिवराय भूपतिः
तत्र श्रीर्विजयो भूतिध्रुवा नीतीर्मतिर्मम ।
असाच वाचला पाहिजे. अखेरीस, कोणते विशेषण लावून छत्रपती शिवरायाचा जयजयकार करायचा, ते समाजनांवर सोपवून मी आपली रजा घेतो. एकमुखाने सभास्थानी गर्जना झाली. दगलबाज शिवाजी महाराजांचा जयजयकार.
सगळीकडून आग्रहाची मागणी
भोरचे व्याख्यान आटोपून मी परतत असताना अनेक स्त्री-पुरुषांनी मला घेरले नि काय वाटेल ते करून आजचे व्याख्यान समग्र छापून प्रसिद्ध करा असा आग्रह केला. या सार्वजनिक आग्रहाला खुद्द शेटेबंधूनी जोरदार पाठिंबा दिला. "खरोखर केशवराव", ते म्हणाले, दगलबाज नि दगाबाज या दोन शब्दांतला भेदच आजवर आमच्या नजरेला कोणी आणला नव्हता. छत्रपती शिवरायाच्या राजकारणी चारित्र्यातील कर्मयोगाचं अस्सल स्वरुपच तुम्ही आज आम्हाला समजावून दिलंत. हे व्याख्यान छापून आलंच पाहिजे.
पुण्यास आल्यावर, लगेच बाहेर पडणाऱ्या प्रबोधनाच्या अंकात मी ते समग्र लिहून छापले. अंक बाहेर पडताच, खुद्द पुण्यातच, त्या अंकाला सारखी मागणी येऊ लागली. प्रबोधन कचेरीचे नि माझेही तोंड चुकून कधी न पहाणारे गृहस्थही अंकासाठी छापखान्याची पायरी चढले. अंक बहुतेक संपत आले होते. तेव्हा मागणीचे तोंड मिटविण्यासाठी तयार असलेल्या कंपोजवरून क्रौन १६ पानी फर्म्यात ४० पानांची एक पुस्तिका छापण्यासाठी कोकाटे छापखान्यात पाठविली. ५ हजार प्रती छापून, एक आणा किमतीला विक्रीला काढली.
बहिष्काराचे कंबरडे मोडले
प्रबोधन किंवा त्या छापखान्यातून बाहेर पडणारा साप्ताहिक लोकहितवादी, अथवा कोणतेही चिटोरे पुण्यातल्या धंदेवाईक पोरानी विकायला घेतल्यास, त्यांना केसरी, ज्ञानप्रकाश वगैरे बामणी दैनिके साप्ताहिके विकायला मिळणार नाहीत, असा पुणेरी बामण एजंटांचा खाक्या चालू होता. या बहिष्काराचे कंबरडे माझ्या छापखान्यातले कंपंझिटर्स आणि प्रिंटर्स दर आठवडयाला ठणठणीत मोडीत असत. मासिकाचा नि साप्ताहिकाचा अंक छापून बाहेर पडला का ते सारे विक्री करायला बाहेर पडत असत. त्यातल्या त्यात, पुण्यात विख्यात नारोशंकरी दणदणाट्या आवाजाचा पत्रविक्रेता श्री. वझे माझ्या छापखान्याचा फोरमन, तो एकटाच दर आठवड्याला लोकहितवादी साप्ताहिकाच्या ५०० वर प्रती हमखास विकीत असे. वझ्याची आरोळी दणकली का घराघरांतून बायकामुले बाहेर डोकवायला येत असत. शिवाय एक आणा मालेची पुस्तके मी साडेचार रुपये शेकड्यांनी त्यांना विकायला देत असे. म्हणजे १०० प्रती विकताच प्रत्येकाला पावणेदोन रुपये फायदा मिळायचा. ही बातमी बाहेर फुटताच, बामणी कारवायांना बळी पडलेली मराठी पोरे मालेची पुस्तके विक्रीला मागायला दारावर गर्दी करू लागली.
याच सुमाराला उत्तर हिंदुस्थानात छत्रपती शिवरायाची बदनामी करणारे एक उर्दू चोपडे बाहेर पडले आणि त्याबाबत श्री. भालजी पेंढारकर यांनी फार मोठे आंदोलन चालू करून, त्या चोपड्याच्या लेखकावर खटला भरण्याचा उपक्रम चालविलेला होता. तशातच पुन्हा माझा `दगलबाज शिवाजी` बाहेर पडायला आणि पुण्यात नि सर्वत्र मोहरमचा हंगाम चालू असायला एकच गाठ पडली. मग हो काय! पुण्यातल्या मुसलमानी मोहल्ल्यांत भराभर प्रती विकल्या गेल्यां. अर्थात पुस्तक वाचल्यानंतर एकेकाचे चेहरे कसे झाले. याचे कोणी फोटोग्राफ घेतले नाहीत. पुण्यातल्या पुण्यात एकाच दिवशी ५ हजारांची आवृत्ती खलास झाली.
दाना दुष्मन चाहिये
विरोधक असावा, पण तो दिल्दार मनाचा असावा, वादापुरता वाद, मन निर्मळ नि दुष्टाव्यापासून अलिप्त असावे. भालाकार भाऊसाहेब भोपटकर हे या पठडीतले असल्याचा माझा अनुभव सांगतो, ते माझ्या बिऱ्हाडापासून अवघे एका हाकेवर, सदाशिव पेठ हीद नि पोष्टाच्या नजीक. त्या वाटेने जाता येता भालाकारांना टाळता येणे शक्यच नसे, आणि भेटल्यावर दोनचार खटके मनमोकळे झडल्याशिवाय त्यांना नि मलाही मोकळे वाटत नसे. एकच गोष्ट सांगतो.
एकनाथषष्ठीनिमित्त लष्करातील भोकरवाडीतील अहिल्याश्रमात माझे व्याख्यान झाले. सविस्तर रिपोर्ट घेण्यासाठी ज्ञानप्रकाशचे श्री. कोकजे यांना कै. काकासाहेब लिमयांनी मुद्दाम पाठविले होते. पुण्यातील माझ्या प्रत्येक व्याख्यानासाठी ही योजना ठरलेली असे. राजेशाही आणि भिक्षुकशाही (किंग क्रॅफ्ट नि प्रीस्टक्रॅफ्ट) मानव समाजावरील अत्यंत दुष्ट संकटे आहेत. या मुद्यावर बोलत असताना, मी म्हणालो, "मी जर व्हाईसरॉय झालो तर प्रथम देशातील सगळी देवळे, मशिदी नि चर्चेस जमीनदोस्त करून टाकीन." यावर सुभेदार घाडगे म्हणाले, "अहो, पण काही देवळात फार छान छान मुर्ती असतात." मी त्या एका ठिकाणी सावडून त्यांचे प्रदर्शन करावे आणि बाहेर `भिक्षुकशाहीच्या कारस्थानाचे पुरावे` अशी पाटी ठोकावी. सुभेदार रिकाम्या देवळात शाळा काढाव्या. मी छे, छे तेथे दारूचे पिठे उघडावे. दारू पिऊन माणसाचा जितका अधःपात होतो. त्यापेक्षा शतपट अधःपात भिक्षुकशाही पुराणांनी नि देवळांनी केलेला आहे.
ज्ञानप्रकाशात समग्र व्याख्यान प्रसिद्ध होताच, भालाकारांनी मला हाक मारून सांगितले- "केशवराव, येत्या भाल्यात चामडे लोळवतो, पाठीला तेल लावून बसा बरं!" आणि भाल्याच्या ताज्या अंकात `करतो कोण ठाकऱ्यांना व्हाईसरॉय?` या मथळयाखाली एक स्फुट आले. त्यात देवळाचे माहात्म्य आग्रहाने प्रतिपादले होते. माझ्याबद्दल फक्त लेखाचा मथळाच.
भालाकारांचा प्रबोधनकाराला आशीर्वाद
`दगलबाज शिवाजी` पुस्तिका विकण्यासाठी छापखान्यातला प्रभाकर चित्रे इतर सवंगड्यांसह सायकलवर बाहेर पडला. `दगलबाज शिवाजी` अशी आरोळी देताच भाऊसाहेब एकदम बाहेर आले. "काय रे प्रभाकर, काय दगलबाज शिवाजी? आता ठाकऱ्यांची मजल येथवर गेली का? दे पाहू एक कापी, वाचलीच पाहिजे."
दुपारी दीड दोनच्या सुमाराला चित्रे विक्री करून सायकलवर परतत असता, भाऊसाहेबांनी जोरदार हाक मारून त्याला टोकले, "ए प्रभाकर, झक्क पुस्तक लिहिले आहे रे. त्या केशवरावाला जाऊन सांग, या कर्मठ ब्राह्मणाचा तुझ्या लेखणीला आशीर्वाद आहे म्हणून. आणि बघ आत्ताच्या आत्ता मला एक ग्रोस काप्या आणून दे. भेटेल त्याला एकेक मी बक्षिस देणार आहे. हे घे दहा रुपये." २-३ दिवसांनी मी भेटल्यावर भाऊसाहेबांनी माझी मनसोक्त स्तुती करून पाठीवर थाप मारली. असे होते फणसासारखे भालाकार भाऊसाहेब भोपटकर.
कै. दत्तोपंत आपटे, इतिहास संशोधक
प्रस्तुत पुस्तक बाहेर पडल्यावर कितीतरी लोक जे मला भेटायला पूर्वी साशंक नि संकोचीत असत तेही पुस्तकाची वाखाणणी करायला छापखान्यात येऊन भेटून गेले. त्यातच एक दिवस सकाळी दतोपंत आपटे आपले विनयशाली स्मितहास्य करीत माडीवर आले. दत्तोपंत म्हणजे अत्यंत विनयशाली, प्रकांड विद्वेत्तेचा मूर्तिमंत अवतार. कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही. आपण बरे आपले काम बरे, अशा वृत्तीचा इतिहास संशोधक, “वाहवा, केशवराव, गोड पुस्तक लिहिलेत, आवडले मला. पण एक मुद्दा टाळता आला असता तर बरं होतं. तो वाचताच मला कससंच वाटलं. नको होता लिहायला तो.”
कोणता तो मुद्दा?
"करत्याची करणी नि मारत्याची तलवार हीच जगाच्या जगण्याच्या धडपडीची गुरुकिल्ली. याच गुरुकिल्लीने शिवाजीने महाराष्ट्राच्या नशिबाला चिकटलेली इस्लामी गुलामगिरी उध्वस्त करून, आपल्या मातृभूमीला हिंदवी स्वराज्याचे स्वातंत्र दिले. यात चुकले कोठे? दगलबाजी असली दगाबाजी काय झाली? अत्याचार कसले? खून तरी कसले? आणि विश्वासघात तरी कुठे घुसला? खटास खट भेटे तेव्हाच मनीचा संशय फिटे. हिंदू लोक आचंद्रार्क इस्लामी सत्तेचे गुलाम राहणार काय? शिवाजीच्या या प्रश्नाला तत्कालीन प्रस्थापित राज्यसत्तेने `होय, होय, होय` अशा मगरूरीच्या प्रतिध्वनीचे उत्तर दिले. त्यावर, `कल्पान्त करीन. पण ही मगरूरी टिकू देणार नाही. हिंदू स्वतंत्र झालाच पाहिजे.` अशी शिवाजीने धडाडीची उलट सलामी दिली. हिंदुस्थान आणि त्यावर राज्य सत्ता म्हणे मुसलमानांची! या दगाबाज परिस्थितीचा नायनाट करण्यासाठी शिवाजीला सवाई दिढी दुपटी दगलबाज बनल्याशिवाय गत्यंतरच नव्हते. प्रस्थापित मुसलमानी राज्यसतेचा विध्वंस, हीच ज्याने आपल्या कर्तव्याची दिशा ठरविली.
ज्या कर्तव्यात त्याने आपल्या वैयक्तिक स्वार्थाचा आमूलाग्र संन्यास केला आणि ज्या कर्तव्यसिद्धीवर कोट्यवधी जीवांचा ऐहिक मोक्ष अवलंबून होता, त्या कर्तव्यासाठी, त्या गुलामगिरीचा कंठ काङ्कन् फोडताना, अफझुलखानचा काय. पण शिर्के, मोरे यांसारखे स्वजातीय कंटक आडवे येताच, त्यांचेही खून पाडणे, शिवाजीच्या राष्ट्रधर्माला आणि राजनीतीला मुळीच विसंगत नव्हते. फार काय, पण विजापुराहून खान आला, त्याच प्रतिज्ञेने व तयारीने शिवाजीचा प्रत्यक्ष बाप शहाजी जरी आला असता, तरी हिंदवी स्वराज्यस्थापनेच्या महत्कर्तव्यासाठी शिवाजीने त्याचाही कोथळा फोडून, आपल्या हाताने मातोश्रीच्या कपाळचे कुंकू पुसायला कमी केले नसते. राष्ट्रोद्वाराच्या पवित्र क्षेत्रात ध्येयाच्या सिद्धीसाठी `आडवा आला की काप` हाच जेथे नीतीचा दंडक आहे. तेथे `मातृदेवी भव, पितृदेवो भव` या संसारी लोकांच्या आंबटवरणी नीतीचे नियम काय होत."
वरील मजकुरातील शहाजीविषयीचा विचारच काय तो दत्तोपंतांना नको होता. बाकी मजकुराबद्दल निःसंकोच मान्यता.
प्रकरण १७
बामणेतरांचा पुढारी एक राजा
बामणेतर चळवळीत आजपर्यंत लढले झगडलेले पुढारी सारे त्यांच्यातलेच सामान्य दर्जाचे होते. छत्रपती शाहू महाराज एका अर्थाने जरी पुढारी मानले, तरी त्यांची भूमिका मार्गदर्शकाची होती. पण सन १९२२ साली ते इहलोक सोडून गेलेले होते. मागस शेतकरी वर्गाला राजाचा अभिमान मोठा! तो झेंड्यावर असला का त्यांना दुनिया खातरजमेत नसे. शाहू महाराज दिवंगत झाल्यापासून आदराने दंडवत घालावा असा कोणी पुढारीच उरला नाही. पण इतक्यात, इसापनीतीतल्या बेडकाची प्रार्थना ऐकून देवाने जसा एक ओंडका राजा म्हणून पाठवला, तसा एक खानदानी राजा पुण्यात अचानक प्रकट झाला.
एक संध्याकाळी मी आणि प्रो. दिनकरराव समर्थ डेक्कन जिमखान्याकडे सायंफिरतीला गेलो होतो. लकडी पुलावरून परतत असता एक मोटारगाडी आमच्या अगदी जवळून भरवेगात गेली. गाडीतील एका इसमाने ‘ठाकरेसाहेब’ अशी जोरकस हाक मारून बाहेर हात काढून थांबा थांबा अशी खूण केली. या राजेशाही गाडीत मला कोण हाक मारणार? जिज्ञासेने आम्ही मागे वळून पहातो तो ती गाडी बऱ्याच लांब अंतरावर जाऊन उभी राहिली. आपण तिकडे जावे का त्यांनाच इकडे येऊ द्यावे? असा क्षणभर विचार करतो न करतो तोच गाडीतील एक इसम खाली उतरून आमच्याकडे येताना दिसला. आम्ही त्याच्याकडे जाऊ लागलो तोच ओळखले का ते अहमदनगरचे सरदार थोरात. त्यांचा माझा दाट परिचय जुनाच असल्यामुळे, सहाजिकच "काय सरदार साहेब, आज इकडे कुणीकडे?` विचारताच, “ तुमची भेट झाली. सुयोग. चला महाराज बोलावताहेत तुम्हाला.” “कोण बुवा महाराज?" शाहू छत्रपती निवर्तल्यापासून मला कोणी महाराजा भेटलाच नव्हता. मग हा कोण? गाडीजवळ जाताच, आत बसलेले देवासचे श्रीमंत खासेसाहेब पोवार बाहेर फूटपाथवर आले. "काय मास्तर, ओळखलं का मला?" खासेसाहेब बोलले. मला ` मास्तर` म्हणताच सरदार थोरात किंचित चमकले. लगेच खासेसाहेबांनी खुलासा केला. " अहो, हे आमचे मास्तर होते देवासला. व्हिक्टोरिया हायस्कुलात मी ज्यूनियर (तिकडची इंग्रेजी ५ वी यत्ता) मध्ये शिकत असताना ठाकरेसाहेब आमचा इंग्रेजीचा वर्ग घ्यायला यायचे." खरी गोष्ट होती ती. मासिक फी नियमित भरण्याची मला शक्यता नसल्यामुळे, प्रिंसिपल शास्त्रीबुवांनी (कै. गंगाधर नारायण शास्त्री, एम.ए.) मला आठवड्यातून ३ वेळा हे शिक्षकाचे काम देऊन फी माफ केली होती.
कोण हे श्रीमंत खासेसाहेब !
देवास छोटी पातीच्या कै. मल्हारराव बाबासाहेबांचे धाकटे बंधू, राजघराण्यातील महत्त्वाकांक्षी मंडळींना आपण नेहमी एखाद्या सत्तेच्या उच्च पदावर आरूढलेले असावे, असे वाटणे साहजिकच असते. पण देवाससारख्या चिमुकल्या संस्थानात आधीच राजसत्तेच्या दोन निरनिराळ्या गाद्या, बडी पाती आणि छोटी पाती. तेथे या राजकुमाराला (थोरला भाऊ गादीवर विराजमान असताना. आत्मविकासाचा कसला अवसर लाभणार ? म्हणून खासेसाहेब ग्वाल्हेरला गेले. देवास आणि ग्वाल्हेरचा ऋणानुबंध निकटचा. तेथे के, माधवराव शिंदे सरकारनी खासेसाहेबाची संस्थानचे महसूलमंत्री म्हणून नेमणूक केली. काही वर्षे तेथे काम केल्यावर संस्थानात कसला तरी गडबडगुंडा झाला आणि खासेसाहेब राजीनामा देऊन संस्थानाबाहेर पडले. सन १९२६ च्या मुंबई राज्याच्या हंगामातच ही घटना घडली.
साहजिकच आता पुढे करायचे काय? हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला. देवासला परत जायचे कशाला नि जाऊन तेथे करणार तरी काय? तेखदार महत्त्वाकांक्षी असामी होते खासेसाहेब, खूप खूप डोके खाजविल्यावर आजूबाजूच्या सल्लागारांनी त्यांना एक युगत सुचविली. पुणे जिल्ह्यात या पोवार राजघराण्याचे इमाम वतनाचे एक खेडे होते. तेथील इनामदार म्हणून मुंबई इलाख्याच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे रहाण्याचा बूट निघाला आणि कायदेशीर खटपटींनी तो मार्ग सुरक्षित मोकळा झाला. ग्वाल्हेरसारख्या एखाद्या संस्थानात मंत्रीपद उपभोगण्याऐवजी, इकडे खालसात निवडणूक जिंकून ब्रिटिश सरकारात मिनिस्टरशिप मिळालेली फस्टक्लास, या धोरणाने खासेसाहेबांची स्वारी पुण्यात एक प्रशस्त बंगला भाड्याने घेऊन, निवडणुकीच्या शर्यतीत आपला मावळी घोडा दामटण्यासाठी ठाण मांडून बसली. निवडणुका लढविण्याच्या जंतर मंतरात १९२३ च्या सातारी धामधुमीत अस्मादिकांनी वाणी लेखणीची लढविलेली करामत सातारा पुण्याच्या बामणेतरी खटपट्ट्यांनी खासेसाहेबांच्या कानांवर घातली असल्यामुळे, सरदार थोरातांच्या मध्यस्थीने त्या कामी माझे सहाय्य घेण्यासाठी आकस्मिक भेटीचे हे सूतोऽवाच होते. शिवाय आणखीही एक कारण त्यावेळी सर्वश्रुत होते.
निफेस्टो लिहून देण्याचा धंदा
निवडणुकीतल्या प्रत्येक उमेदवाराला, इतर अनेक खटाटोपांच्या बरोबरीनेच आपला निवडणूक जाहीरनामा झक्क तयार करून सर्वत्र फैलवावा लागतो. जनतेच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी, आजवर मी काय नि कुठे कुठे दिवे पाजळले, कसकसा उजेड पाडला, समाजात नि सरकारात माझं वजन किती क्विन्टल आहे. माझं घराणं पिढ्यान् पिढ्या लोकहितासाठी कसकस अमलं झगडलं नि झिजलं आहे, आणि मला जर निवडून दिलंत, तर मी जनतेसाठी काय काय करणार आहे वगैरे आणि इत्यादी खुमासदार मजकूर त्या जाहीरनाम्यात आकर्षक भाषेत लिहावा लागतो. सहसा हे काम उमेदवारांना जमत नाही. त्यासाठी चिटणिसी कसबाचा कसबीच मदतीला घ्यावा लागतो.
या निवडणुकीच्या हंगामात हा चिटणिसी कसबाचा उद्योग `लोकहितवादी` साप्ताहिकातील जाहिरातीने आणि जाहीर झालेल्या उमेदवारांच्या नावपत्त्यावर माहितीपत्रके पाठवून मी चालविला होता. मुंबई इलाख्यातील ७-८ उमेदवारांची कामे माझ्याकडे आली. त्यात भुसावळचे दिवाणबहाद्दुर डोंगरसिंग पाटील, मालेगावचे जाधवराव ही दोनच नावे आज आठवतात. साहजिकच खाससाहेबांना, माझी ओळख काढून त्या कामी सहकार घेण्याची उत्कंठा लागली असावी. इंग्रेजी मराठीत मॅनिफेस्टो तयार करणार मी आणि आकर्षक रीतीने छापण्याचे काम माझ्याच छापखान्याला असा माझा दुहेरी हेतू तो चांगला सिद्धीला गेला आणि या अभिनव उद्योगात मला ७-८ शे रुपयांची प्राप्तीही झाली.
घोडे गंगेत न्हाले पण सुके ठाकच राहिले!
दोनचार वेळा खासेसाहेबांनी मला भेटीला बोलावून नेले. पण त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या कट्टर जातीयवादी सल्लागारांचा पडलेला वेढा पाहून, शाब्दिक सल्लामसलतीशिवाय विशेष काही करावेसे वाटले नाही. त्यांनी, कोणाकडून तरी तयार करविलेला एक मसुदा मला दाखवला. "हे पहा खासेसाहेब, निवडणुकीसाठी आपण वडलोपार्जित इनामदारीच्या एका खेडयाच्या घोड्यावर स्वार झाला असला, तरी आपण या प्रदेशात अगदी परस्थ आहात. आजकाल कडवटीचा कळस झालेल्या बिनबुडाच्या बामणेतरी चवळीच्या तथाकथित खऱ्या खोट्या पुण्याईत आणखी कडवट जातीयवादाचा मसाला घालण्याचा या मसुद्याचा यत्न मला पसंत नाही." असा स्पष्ट जबाब देऊन मी त्या भानगडीत डोकवायचेच नाही असा निश्चय केला.
झाली निवडणूक झाली. खासेसाहेब पुणे जिल्ह्यात भरगच्च मते मिळवून निवडून आले. त्यानंतर मुंबई सरकारात मंत्रिपद पटकविण्याच्या खटपटी चालू झाल्या, खासेसाहेबांचा मुक्काम मुंबईला पडला. वशिल्याची प्यादी बुद्धिबळाच्या पटावर भराभर सरकू लागली. गाठ होती आतल्या गाठीच्या गोऱ्या मुत्सद्यांशी! मंत्र्यांच्या नेमणुकीची यादी बाहेर पडली. पुण्याचे डॉ. रँग्लर परांजपे निवडले गेले. भास्करराव जाधव आमदारीतच बसले. पण हा निकाल बाहेर पडल्यानंतर केवळ शपथविधीसाठीसुद्धा खासेसाहेब कौन्सिल हॉलची पायरी चढले नाहीत. ते तडक निघून गेले. थोड्याच दिवसांत अचानक एक योग आला. ब्रिटिश सरकारचे लंडन येथील प्रतिनिधी नारायणराव समर्थ लंडनला वारले आणि त्या जागी डॉ. रँग्लर परांजपे यांची नेमणूक होऊन, भास्करराव जाधव आपोआप मंत्रिमंडळात सरकले. खासेसाहेबांनी किंचित कळ सोसली असती, तर कदाचित त्यांनाही चान्स लाभला असता. पण राजेशाही पिंडाच्या मानी माणसाला एवढा धीर सुचणार कसा? अखेर, घोडं गंगेत न्हालं. पण आलं तसं सुक ठाक परत गेलं.
राजकारण- महाभयंकर व्यसन
सध्या समाजकारणाचे डांगोरे तावातावाने पिटले जात असले, तरी सर्व कार्यकर्त्यांचा ओढा राजकारणाकडेच विशेष दिसतो. राजकारणात सत्ताप्राप्तीचा संभव असतो. समाजकारणात कोरड्या स्तुतीपेक्षा हाताला फारसे काही लागत नाही. तशातच राजकारणात प्रथम मुरलेल्या मुरंब्यांना ते टाकून समाजकारणाला वाहून घेण्याचा प्रसंग आला म्हणजे व्हिस्कीबाजांना हातभट्टीवर जगण्याचा प्रसंगच तो? काही वर्षे राजकारणी पुढारीपणात किंवा एखाद्या सत्तास्थानी भरपूर मिरवल्यानंतर अचानक निवडणुकीत ठोकर बसून तो बाजूला पडला, म्हणजे त्याची अवस्था जलाविण माशासारखी होते. कित्येक तर वेडे पिसाटही बनतात. राजकीय क्षेत्रात दोन प्रकारचे चळवळचे असतात. काही थोडे `किंग` बनण्याच्या ईर्षेने फुरफुरलेले असतात, तर काही `किंगमेकर्स` म्हणजे आपल्या इच्छा-श्रम-मात्रे ठरवू त्याला किंग म्हणजे सत्ताधारी खासदार, आमदार किंवा नामदार बनविण्यातच समाधान मानणारे असतात. भाऊराव पाटील या दुसऱ्या वर्गातला चळवळ्या होता.
१९२६ सालची सातारी निवडणूक
अस्पृश्यादी मागस वर्गातल्या उमलत्या पिढीच्या शिक्षणाचा प्रश्न त्याने जरी आपल्या जीवनाचे ध्येय ठरविले असले, तरी सार्वजनिक हिताहिताच्या भरती ओहोटीला कारण असलेल्या राजकारणापासून तो लयमात्र अलिप्त राहू शकत नव्हता. तशात या सुमारास बामणेतरी आंदोलनाने सामाजिक क्रांतीच्या फसव्या मुखवट्याखाली राजकारणी सत्ताबाजींचा आणि सरकारी नोकऱ्यांचा सोस चालविला होता. एकजात सारे बामणेतर पुढारी आमदारकी नामदारकीसाठी निवडणुकांच्या शर्यतीत घुसू पहात होते. निवडणुकीपुरता गोरगरीब जनतेचा कळवळा नि जिव्हाळा. ती पदरात पडली का मग पुढे त्याव जनतेच्या चिंध्या पांध्या पिळून चालू व्हायचा जागोजाग आमदार नामदारांचा सत्कार सोहळा? भाऊरावला हे पसंत नसायचे.
१९२६ सालच्या निवडणुकीत बामणेतर पार्टीतर्फे खानबहादूर कूपर आणि भास्करराव जाधव उभे राहिले. वास्तविक या दोघाविषयी मागील अनुभवावरून बामणेतरी लोकमत फारसे अनुकूल नव्हते. आचरेकरासारखा तडफदार एमे एलेल्बी वकील गेल्या निवडणुकीत जाधवरावांनी निर्माण केलेल्या तिरंगी सामन्यात निष्कारण बाजूला पडला, हे शल्य लोकांना डाचत होते. तसेच ज्या जिल्ह्यात भाऊरावाचा नैतिक आणि प्रत्यक्ष लोकसेवेचा शब्द, ही एक शक्ती बनत चालली होती, तेथे कूपर लक्षाधीश असला तरी लोकप्रियतेपासून चार फर्लांग दूरच पडत चालला होता.
त्यातही पुन्हा एक भानगड झाली होती. कूपर आणि भाऊराव यांचे खडाष्टक आता जगजाहीर झालेले होते. भाऊराव जात्या भयंकर तापट माणूस. केव्हा कुठे खवळून उठेल आणि कुणाच्या अंगावर धावून जाईल, याचा नेम नसे. निवडणुकीच्या वाटाघाटी सातारा चौकातील एका दुकानातल्या बैठकीत चालल्या असताना, कूपर सहज तिथे आला. नेहमीच्या शर्करावगुंठित स्मितहास्यात "काय भाऊराव, आमच्या पाठीशी आहात ना तुम्ही?" असे विचारताच, "हो हो. तुमची पाठ सोडणार कशी?” असा भाऊरावाने जबाब दिला. त्यावर दोघांचे काही संभाषण झाले आणि भाऊरावाने एकदम उसळून “खानबहादूर, तुमची सारी संपत्ती नि जिल्ह्यातील दारू इरेला घाला, हा भाऊराव पाटील निवडणुकीत तुम्हाला पाठीवर पालथा पाडणार आहे." अशी जोरदार जाहीर धमकी दिली. सायंकाळच्या बाजारी गर्दीतच हा प्रकार घडल्यामुळे, त्या धमकीचा प्रतिध्वनी शहरभर उमटत राहिला.
काट्याने काटा काढला पाहिजे
एखादी विलक्षण प्रतिज्ञा कोठेतरी कोणाशी करायची आणि मग ती पार पाडण्याच्या युगतीसाठी माझ्याकडे धाव घ्यायची, हा भाऊरावाचा खाक्या. कूपरला दम भरल्यावर दुसऱ्याच दिवशी भाऊराव मला पुण्यास येऊन भेटला. "हवी ती युगत काढा, पण या निवडणुकीत कूपरला पाडलाच पाहिजे. जाधवरावाविषयी मला मोठे प्रेम आहे असे नसले, तरी दगडापेक्षा वीट मऊ. माझी प्रतिज्ञा खाली पडली तर मग जिल्ह्यात पुन्हा तोंड दाखवायला नको. बोला काय करणार ते."
कूपरला हार द्यायचे काम तितके सोपे नव्हते. त्याची सावकारी आणि दारूपिठे ही अचाट शक्ती होती. कट्टर विरोधकालाही तो नुसत्या दृष्टिक्षेपाने आणि मधुमधुर स्मितहास्याने चीतपट करून आपल्या बाजूला पुरा वळविता आला नाही, तरी त्याच्या विरोधाची नांगी तो साफ बोथट पाडायचा. शिवाय हातात पैसा महामूर, जाधवराव हिशोबी जरूर पडेल तिथे तेवढेच खर्च मोजून मापून करणारा. अशा हिशोबी माणसाला कूपरसारख्याशी दोन हात सफाईत करायला उठवायचा कसा? कारण चढाईची एखादी योजना सुचविली तर आधी तो तिचा चर्चेच्या किसणीवर कीस पाडणार. प्रतिष्ठेचा कस पहाणार." निवडणुकांचा हैदोस येऊ दे चांगला रंगात, मग ऐनवेळी सुचेल ती युगत जाधवरावाच्या माथी मारण्याचा यत्न करू. सध्या मात्र आम्ही तुमच्या बाजूने आहो, एवढा दिलासा त्याच्या कानी जाऊ दे." एवढा मंत्र देऊन भाऊरावाला रवाना केला. काट्यानेच काटा काढणे जरूर होते. पण कसे ? जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या ठिकाणी बुरखेदार गाठी घेतल्याशिवाय निश्चित तोडगा मिळणार कसा ?
वाळव्याला भोक पाडावे लागणार
भाऊरावाचे पाठिंब्याचे आश्वासन मिळाल्यामुळे, जाधवराव दोन-तीन वेळा मला पुण्याला येऊन भेटले. जिल्ह्यातील एकंदर परिस्थितीची वस्त्रगाळ चर्चा झाली. वाळवे केंद्रावर कूपरचा जोर विशेष. तेथे तो गचकवल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही. हा मुद्दा जाधवरावांच्या भाषणात निघाला. त्यावर मी आणि भाऊरावाने वाळव्याचे वातावरण तिऱ्हाईतपणे पण गुपचुप अंदाजून यावे, असे ठरले. `वाळव्याला कूपर गचकत नाही, त्याला गचकवलाच पाहिजे, मग त्यासाठी आयत्या वेळी युगत सुचेल. ती अंमलात आणली पाहिजे, मग त्यासाठी लागेल तो खर्च, इष्टानिष्टतेचा विचार न करता, करायला तयार असाल, तर आम्ही या भानगडीत पडतो. नाहीतर रामराम." असे मी जाधवरावांना स्पष्ट बजावले. त्यांनी होकार दिला.
चार-पाच दिवसांनी भाऊराव पुण्याला आला नि आम्ही दोघे वाळव्याच्या फिरतीवर गेलो. जाधवरावांच्या पार्टीच्या काही निवडक पुढाऱ्यांच्या बैठकी घेतल्या. पोलिंग स्टेशनची जागा पाहिली आणि अखेरची युगत अंमलात आणण्याचा बेत नक्की होऊन तो जाधवरावांना कळविण्यात आला. त्यांनी खर्चाची व्यवस्था परस्पर केली.
निवडणूका-शिसारी आणणारा खटाटोप
लोकशाही आली, जेवताना तोंडातच घास घालण्याइतपत अक्कल असणारांना मताचा अधिकार मिळाला. उमेदवारीसाठी बेअक्कलांना अक्कल काढ्याचे कोंब फुटले. इतका स्वस्त शहाणपणाचा बाजार उफलला. निवडणुकीसाठी घरेदारे गहाण टाकणे किंवा विकण्यापर्यंत मुत्सद्देगिरीची शीग गाठण्याइतके शूर नरवीरांचे पेव फुटले. बस्स, आता काय! पृथ्वीवर स्वर्गच आला! लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी चालविलेले राज्य आले! हा वरवरचा देखावा कितीही बहोत बढिया दिसला, तरी निवडणुकांच्या हंगामात कसकसल्या समाजनीतिविघातक व्यसनांच्या नि लाचलुचपतीच्या बळावर निवडणुकांचे लढे लढवले जातात, याचा तपशील पाहिला का शिसारी येते. समोरच्या प्रतिस्पर्ध्याला आदळण्यासाठी संभावितपणाचे मुखवटे घालून मिरवणारे उमेदवार मतपत्रिका पेटीत पडेतोवर कसकसल्या हिकमती लढवतील, ते सांगणे नि ऐकणेही किळस आणणारे आहे. अनाहूतपणे मी या फंदात गेलो आणि त्यातील सारे प्रवाह, प्रघात नि प्रवाद पाहून इतका विटलो की कोणत्याही निवडणुकीचा उमेदवार प्रचारासाठी माझ्या उंबऱ्याजवळ आला की माझ्या कपाळाला आठ्या पडतात. निवडणुकांच्या अनंतमुखी जंतरमंतरांच्या चक्रव्यूहातून इच्छा, कल्पना नि हेतू किंवा स्वार्थ नसतानाही मला माझे शील सांभाळून वावरावे लागलेले आहे. परिस्थतीवर मात करण्याचा माणसाने कितीही हिय्या केला, तरी तिचा रेट्याच असा जबरदस्त असतो की त्यापुढे मोठमोठ्या शहाण्यांनाही वेड पांघरून पेडगावची यात्रा साजरी करावी लागते.
दारूला दारूनेच मारली पाहिजे
मतदानाच्या आदल्या दिवशी मी आणि भाऊराव वाळव्याला जाऊन आलो. तेथील जाधवरावी खटपट्यांना निश्चित सूचना दिल्या. ठरलेल्या नाटकातील पात्रे शिकवून तयार केली. पोलिंग बूथपासून थोड्या अंतरावर एका ओसाड झोपडीत दारूचा रांजण ठेवण्यात आला होता.
मतदानाचा दिवस उजाडला. गावोगावच्या मतदारांच्या टोळ्या आपापल्या दादांच्या पुढारपणाखाली झुंडींनी येऊ लागल्या. कूपर पार्टीचे मतदार तर चक्क (पंढरीच्या वारकऱ्यांप्रमाणे) टाळमृदंग वाजवीत " धनजी धनजी " जयघोष करीत येऊ लागले. आमच्या कपट नाटक कंपनीतील पात्रे आपापल्या कामाला लागली. एकाने कूपरटोळीतील दादाला भेटायचे आणि "खानबहादुरांनी ` व्यवस्था ठेवली आहे, तिकडे लोक घेऊन चला. दोनदोन तीनतीन." अशी पडदानशील सूचना कानात द्यायची. व्यवस्थेची व्यवस्था ! मग हो काय विचारता ! झोपडीत टोळ्यांच्या टोळ्या घुसल्या नि आकंठ प्राशनाने तर्रर्र होऊन बूथवर येऊन बसल्या. मंडळी भररंगात आलेली पाहून, आमचा एक नट त्यांना बूथवर घेऊन जायचा. " हे पहा, " हे पहा, कूपर बिपर काही आत गेल्यावर बोलायचे नाही हं. फक्त हत्तीपुढे तीन खुणा करून परतायचे. लक्षात ठेवा हत्ती." एवढा मंत्र द्यायचा. मतदार आधीच तर्रर्र झालेला प्रत्येकजण जायचा नि हतीपुढे तीन खुणा करून परत यायचा. असे अंदाजे तीनसाडेतीनशे कूपरचे मतदार आमच्या नाटकाने फोडले.
संध्याकाळी साडेचारच्या सुमाराला कूपर आपल्या मोटारीतून वाळवे दूधवर आला. त्याच्या पार्टीचे धनजी भजनवाले त्याला सामोरे गेले. कूपर काय? केले मतदान? दादा ‘बिनचूक आणि खानबहादूर आपण’ व्यवस्थाही चांगली ठेवलीत. लोक खूप आहेत. सगळ्यांनी हत्तीपुढे तीन तीन खुणा केल्या. आता जाधवरावाला म्हणावं बस ल्योका हात चोळीत." कूपर दचकलाच. "व्यवस्था? कसली? कोणी केली? हत्ती जाधवरावाचा घोडा माझा रागाने कूपर लालबुंद झाला. त्याने कार्यकर्त्यांना बोलावून, "हा काय गोंधळ ? तुम्ही काय करीत होता ?" वगैरे खूप तासड़पट्टी केली. मग थोडा वेळ विचार केल्यानंतर त्यांना विचारले, "भाऊराव पाटील आला होता काय, कोणी पाहिला काय ? खास, हे त्रांगडे रचायला ठाकरेच येऊन गेलेले असावे. हे पाटलाचे डोके नव्हे."
निवडणुकीत कूपर पडले आणि जाधवराव निवडून आले. निकाल बाहेर जाहीर झाल्यावर भाऊरावाने गप्प बसावे का नाही ? छे. तात्काळ तो कूपरच्या हॅटिंगवर्थं बंगल्यावर गेला नि “खानबहादूर, भाऊ पाटलाचा रामराम घ्यावा म्हटलं”.इतके ओरडायला विसरला नाही.
माझी १९०४ ची गोव्याची पहिली सफर
मी सर्व महाराष्ट्रभर प्रवास केलेला आहे. कित्येक ठिकाणी अनेक दिवसांचे वास्तव्यही केलेले आहे. पण हा सारा चक्क योगायोगाचा मामला स्वतः उठून अमक्या ठिकाणी जायचे, असे सहसा घडलेच नाही. कोणाचे तरी निमंत्रण यायचे, खर्चाची परस्पर सोय व्हायची आणि मी प्रवासपेटी उचलून चालायला लागायचे. सन १९०४ साली गोव्याच्या पहिल्या सफरीचा योग असाच अनाहूत आला.
त्याकाळी गोव्याच्या मँगनीझ (कच्च्या लोखंडाच्या) खाणी विकत घेण्याचा एक विलक्षण व्यापारी धौशा चालू झालेला होता. मुंबईच्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी आपापले हिकमती अडत्ये तेथे पाठवून, खाणी किंवा मँगनीझ आढळेल त्या जमिनी विकत घेण्याचा तडाखा चालू केला होता. नाट्य-काव्य लेखनात रंगलेला तरुण मी. मी कशाला या लोखंडी भानगडीत पडणार? पण पडण्याचा योग आला. कृष्णा सावंत नावाचा माझा एक दोस्त होता. नेहमी अपटुडेट पोषाकात असायचा. पनवेलीहून मी मुंबईला येत असे तेव्हा आणि पुढे नरपागा जमवून भाड्याच्या खोलीत बिऱ्हाड करून रहायचा तेव्हा, कृष्णा सावंत दररोज मला भेटायचा. तो काय व्यवसाय करायचा, याची मी कधीच चौकशी करीत नसे. माणूस मोठा दिलदार जिव्हाळयाचा प्रसंगी उपयोगी पडणारा. अनेक वेळा माझ्याबरोबर तो पनवेलला घरीही येऊन दोनचार दिवस रहायचा, त्यामुळे आमचा त्याचा घरोब्याचा ऋणानुबंध चांगलाच जमलेला होता.
चलो गोवा
एक दिवस असाच कृष्णा पनवेलला आला नि म्हणाला, "केशव, चल माझ्याबरोबर गोव्याला.` गोवा म्हणजे आम्हांला त्यावेळी विलायत वाटायची. कोकण लत्त्याला फारसा मी फिरलेलाही नव्हतो. आजी आईची परवानगी मिळाली. पण मी म्हटलं, "कृष्णा, माझ्या या अशा कण्ट्री पोषाकाने कसा येणार तुझ्या बरोबर ?" तो म्हणाला, "अरे बाहेर तर पड, कपडे कपडे काय करतोस. एकदम तुला कंप्लीट साहेब बनवतो मुंबईला गेल्यावर. आहे काय त्यात एवढे. एक बड़ा गुजराथी व्यापारी कापायला मिळालाय मला. सध्या गोव्याच्या मँगनीझ खाणीची खायखाय सुटली आहे मुंबईच्या व्यापारी मंडळींत. एकाने मला त्यासाठी गोव्याला पाठवायचा केलाय बेत. आज माझा खिसा बेहद गरमागरम आहे. "
मुंबईला आल्याबरोबर क्रॉफर्ड मार्केटात तयार कपड्याच्या दुकानात मला नेऊन बूट-हॅट्यन्त नेकटाय कालरवाला साहेब बनवले. दोन तीन दिवस कृष्णा भेटला नाही. एका सायंकाळी " उद्या सकाळी ८ च्या बोटीने आपल्याला निघायचे, तयारीत रहा, असे सांगून गेला. उजाडताच लख्या नावाचा एक कोकणी पोऱ्या बरोबर घेऊन तो आला. आम्ही झुवारी (ZAORI) बोटीने निघालो. बोटीत पाऊल ठेवताच कृष्णाने मला एक हजार रुपयांच्या नोटांचे बंडल हातात ठेवून म्हटले, "हे बघ, पैसा तू सांभाळ पडेल तो खर्च तू करायचा. माझ्याजवळ हे पाप नको. कारण? आज तुला प्रथम सांगतो. मी आहे पक्का शाक्तमार्गी. आमची समाधी लागली का कोणीही खिशावर मारील डल्ला नि आपण परदेशात करायचे इल्ला." मी म्हणजे, पैसे तुला. दोघंनाही सांभाळायची जबाबदारी माझ्यावरच वाटतं ?
बोट खांदेरी उंदेरीच्या आसपास गेली असेल नसेल तोच कृष्णा अगदी तर्रर्र होऊन आला. त्याने कप्तानालाही तीर्थप्रसाद दिला असावा. स्वस्थ खुर्चीवर काही वाचीत पडायचा. असा त्याचा क्रम चालला होता. फक्त लख्याने माझी पाठराखणी साऱ्या सफरभर फार इमानदारीने केली. "साहेब, काही घाबरु नका. मी आहे गोव्याचाच, तिथली सारी माहिती आहे मला. म्हणूनच साहेबानं मला बरोबर घेतलं आहे."
दोक्तारांची तपासणी
दुसन्या दिवशी संध्याकाळी ४ वाजता बोटीने वेंगुर्ला बंदर सोडले आणि दिवेलागणीच्या सुमाराला ती पणजीच्या खाडीत वळू लागली. बोटीवरली ब्रिटिशाची निशाणे भराभर उतरून पोर्तुगीज दोस्तीची निशाणे बोटीच्या डोलकाठीवर चढविण्याची खलाशांची एकच धामधूम उडाली. मला तरी हा सारा प्रकार नवलाईचाच होता. इतक्यात लख्या म्हणाला, "साहेब, बोट पणजीला न लागता बेतीला लागणारसे दिसते." मला पणजी काय नि बेती काय, सारेच गौडबंगाल झाले. बोट थांबली. धक्का बिक्का दिसेना. लांबवर काठाशी अनेक होड्या बोटीकडे येण्यासाठी सज्ज असलेल्या दिसल्या. इतक्यात एक मधवा आला आणि त्यातून ५-६ लष्करी युनिफॉर्मचे सशस्त्र हापसर तड़ातड़ उड्या मारून बोटीवर आले. भराभर वरच्या मजल्यापासून तो थेट तळमजल्यात घुसून त्यांनी बोटीची कस्सून पहाणी केली. प्रवाशांचे चेहरे मोहरे पिलपिल्या डोळ्यानी न्याहाळले. मिष्टर कृष्णराव तर एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नोकझोकात मिशावर पीळ देत त्यांच्या नजरेला नजर भिडवून पहात होता, स्वारी अर्थात पुरी घोड्यावर बसलेली होतीच, तपासणी पुरी होताच, त्या गोऱ्या पुर्तुगेज हापसरांनी अल्बेलीचा दाखला कप्तानाच्या हातात ठेवला नि मोठ्याने शिटी वाजवली. तो ऐकू जाताच किनाऱ्यावरच्या होड्यांचा ताफा सोसाट्याने बोटीकडे आला. फासिंदरांना होड्यांत चढविणे, त्यांच्या सामानाच्या पेट्या वहाणे वगैरे कामे करणारांची एकच भाऊगर्दी उडाली. कोणी कोणाचे सामान कोणत्या होडीत टाकले, याचाही आम्हांला काही अटकळ होईना. आमच्या पेट्या बेडिंगची तीच गत झाली. लख्या म्हणाला "साहेब काही काळजी करू नका. कष्टम कचेरीत आपले सामान बिनचूक मिळेल."
डॅम्फूल, हम फस्क्लास !
ढोपरढोपर पाण्यातून लोक वाळूच्या किनाऱ्यावर भराभर होड्यांतून उतरून चालले होते. आम्ही बूटवाले साहेब. लख्याने सूचना करताच, एकेका नावाड्याने आम्हाला उचलून सुक्या वाळूवर आमचा गणपती बाप्पा मोरया केला. एका प्रशस्त शेडमध्ये प्रवाश्यांची दाट झुंबड उडालेली. हे लोक भराभर बाहेर का जात नाहीत? इथं कशाला गचडी करून थांबले आहेत ? साहेब, एकेकाची दोक्तार तपासणी करतो न् मग त्याला बाहेर सोडतात." सारे प्रवासी गोवेकरच होते. त्यांत आम्ही सूटबूटवाले ममईकर, दरवाजावर दोन गोरे डॉक्टर एकेकाचा हात दाबून पहात, गळ्याजवळ तपाशीत आणि बाहेर सोडीत. आमचा तर्रर्र मिष्टर हे काय सहन करणार? तो मोठमोठ्याने इंग्रेजीत डॅम फूल.... व - फस्सलास पैसेंजर ..... व्हॉट डू यू मीन... नॉनसेन्स वगैरे हातवारे करून कलकलाट करू लागला, मी त्याला आवरण्याचा यत्न करीत असताना तडकावले" कृष्णा, असंच जर तू यापुढे करणार असशील तर मी इथूनच परत जाणार बुवा. आपल्याला हा धिंगाणा नापसंत आहे." तो किंचित चमकला, पण वी आर फस्स क्लास फस्स क्लास हे मात्र त्या डॉक्टरांना जोराजोराने सांगत होता, नशीब आमचे. त्या डॉक्टरांनी लगेच आम्हांला पुढे घेतले आणि हात चाचपून सोडले.
बाहेर पडताच लख्याने कष्टम कचेरीकडे धाव घेतली नि आमच्या पेट्या बेडिंग शोधून काढले. हमालाच्या हवाली करणार तोच एक देशी शिपाई एक चोळीचा नवा खण हालवीत आमच्यापुढे आला नि कोकणीत म्हणाला, "तुमच्या सामानात हा सापडला, दीड रुपया कर भरा. आमच्या पेट्या बेडिंग तर टाईट पट्टयांनी बांधलेल्या, मग ही भलतीच मानगड कसली ? लख्याने त्याला कोकणीत खडसावले जा जा. तुला तो इनाम दिला आहे. उगाच तणाणा करू नको." त्या शिपायाने बत्तिशी काढून अगदी लवून मानेचा प्रणाम केला नि निसटला. एक भानगड निपटली.
पण दुसरी उपटली. सामानाच्या या शोधाशोधीत मी आणि लख्या असताना हुजूर महाशय कृष्णराव बेपत्ता. आत्ता याला हुडकायचे कुठे नि कसे? लख्या म्हणाला, " साहेब, मी यांना पक्का ओळखतो. आपण जाऊ आता वाफोरवर. पलीकडे पणजीच्या धक्क्याला जायचंय. बड़ेसाब भेटतील ठरल्या ठिकाणी. " संतापाने माझे मस्तक भडकले. कृष्णा इतका बेफाम दारुड्या असेल, असा पूर्वी मला संशय आला नव्हता. पण आता काय करणार? आलिया भोगाशी असावे सादर.
पंजिमच्या धक्क्याला जाण्यासाठी वाफोरकडे जात असताना वाटेतच एका झुडपातून कृष्णा बाहेर पडला आणि साळसूदपणे आमच्या बरोबर चालू लागला. लख्या माझ्या कानात हळूच सांगतो, "साहेब. बोटीतलीचा अंमल कमी झाला म्हणून इथल्या टावरणात ताडी ठोकली साहेबांनी. त्यांना सगळ्या जागा माहीत आहेत." वाफोरात बसलो. एखाद्या कॅप्टनच्या अवसानात कृष्णा मात्र उभाच राहिला. हा काही का करीना, आपण अगदी दुर्लक्ष करायचे, असे मी मनाशी ठरवले. वाफोर पणजीच्या चढत्या दगडी काठाशी लागतो न लागतो, तोच कृष्णाने विल्यम द काँकररच्या अवसानात तडाड उडी मारली आणि तीरासारखा वर निघून गेला. काठावरच्या हमालाला सामान सुमान देऊन आम्ही धक्क्यावर आलो. कृष्णा बेपत्ता. आता याचा शोध घ्यायचा कुठं ? लख्याच्या सूचनेप्रमाणे आम्ही एका (त्याच्या ओळखीच्या) सारस्वत मध्यमवयीन बाईच्या घरी जाऊन टेकलो. ती बाई प्रवाश्यांची खानावळ चालवीत् असे. स्नाने उरकून आम्ही दोघे जेवलो. रात्रीचे आठ साडेआठ झाले होते. आता त्या मष्ण्याला शोधायचा कुठे ? लख्या म्हणाला, चला आता जरा बाहेर पाहू कुठं शोध लागतो का. नाहीतर आपण दोघे उद्या सकाळच्या बोटीने जाऊ परत मुंबईला.
बेपत्ता कृष्णा फिरंगी लॉकअपमध्ये
आम्ही दोघे पंजिम शहराची मौज पहात पहात बॅण्डस्टॅण्डवर युरपियन गायन वादन चालले होते. शेकडो स्त्रीपुरुष जमले होते, तेथे थांबलो. इतक्यात ‘ठाकरे..... ए ठाकरे...ए लख्या...’ आरोळी ऐकू आली. लख्या आरोळीच्या दिशेने गेला नि परत येऊन म्हणाला " चला, साहेब सुखरूप आहेत. चला." आम्ही जाऊन पहातो तो खुदावंत कृष्णराव सावंत महाराज पोलीस लॉकअपमध्ये गजाआड ऐटीत उभे राहिलेले. बाहेर एक लट्ठेभारती गोरा पोलीस हापसर स्टुलावर असलेला, भाषेची खरी पंचाईत मला प्रथम इथे टोचली. मी इंग्रेजीत मराठीत बोललो, तर ते त्याला समजायचे नाही आणि तो पोर्तुगीज कोकणीत बोलला तर मला उमजायचे नाही. पण लख्या होता आमचा तल्लख इंटरप्रिटर, तेवढ्यासाठीच त्याला बरोबर घेतला होता. माझे मराठीतले प्रश्न लख्या त्या फिरंगी गोऱ्याला कोकणीत सांगायचा नि त्याचा जबाब मराठीत कळवायचा. गोव्याच्या संबंध दौऱ्यात लख्याने हे काम चोख बजावले, चौकशी करता समजले की
‘हा मुंबईकर फिरस्ता बेफाम दारू पिऊन रस्त्यावर दंगल करीत होता, सबब याला गिरफदार करण्यात आले, याची झडती घेता, याच्या खिशात पोलिसांना बाळासाहेब राणे यांना लिहिलेले एक पत्र सापडले. `राण्यांच्या बंडा’ने नुकतेच काही वर्षांपूर्वी गोवेकर फिरंग्याचे हातपाय सणसणीत डागले होते. राणे हे नुसते नाव कानी पडताच फिरंगी दचकत असत. अशा अवस्थेत बाळासाहेब राण्यांना मुंबईच्या त्यांच्या एका गोवेकर मित्राने लिहिलेले मराठी पत्र ! आणि ते कृष्णाच्या खिशात ! पत्रातला मजकूर काही का असेना, राण्यांना लिहिलेले पत्र एका मुंबईकर ब्रिटिश राज्यातल्या नागरिकाच्या खिशात क्या बात है!
कृष्णाला लॉकपमधून कसा सोडवला
कोठडीवर बसलेल्या लट्ठभारती गोऱ्या फिरंग्याची समजूत कशी घालावी. हा माझ्यापुढे मोठा प्रश्न पडला. अखेर मी लख्याशी बोलावे नि त्याने कोकणीत त्याला सांगावे, आणि त्यानेही कोकणीतच उत्तर द्यावे, असा प्रकार चालू केला. फिरंगी कोकणीत छान बोलत असतं. मी खुलासा केला, "आम्ही व्यापारी आहोत. मँगनीजच्या खाणी विकत घेण्यासाठी आलो आहोत. ठिकठिकाणच्या येथील लोकांसाठी मुंबईकर मित्रमंडळींची ओळखपत्रे आम्ही आणली आहेत. त्यातच एक पत्र बाळासाहेब राण्यांच्या नावाने आहे. कच्चे लोखंड असलेल्या जागा कोठे असल्यास, त्यांचा सौदा पटवून द्यावा. एवढाच मजकूर त्यात आहे. बाकी काही भानगड नाही. वाटेल तर पत्र वाचून पहा." फिरंग्याचे समाधान झाल्यासारखे दिसले. पण तो लेकाचा जागेवरून काही हालेना. लख्याने मग त्याला डोळे मिचकावून काही खुणावले. त्याने हाताचे दोन पंजे आम्हांला दाखवले. लख्याने एक पंजा दाखवला नि मला म्हटले, "साहेब पाच रुपये द्या पाहू" मी दिले. ते त्याने त्याच्या कोटाच्या खिशात कोंबताच स्वारी उठली, किल्ल्यांचा जुडगा खळखळवला आणि कोठडीचे भले कुलूप उघडून कृष्णाला मोकळे केले.
बिऱ्हाडाकडे जाताना कृष्णाने गोवा पोलिसांच्या आडदांडपणावर आणि स्वतःच्या जंटलपणावर प्रवचन झोडायला सुरूवात करताच, " मुकाट्याने तोंड बंद करून बरोबर येत असलास तर ये. आम्ही उद्या सकाळच्या बोटीने परत जाणार मुंबईला. तू इतका अर्कट दारुड्या असशील, असं मला आधी कळतं तर या गोवा सफरीच्या फंदातच मी पडलो नसतो." इतकं दरडावून सांगताच तो रस्त्यातच माझे पाय धरू लागला. " हे बघ केशव, चूक झाली माझी, पुन्हा असे होणार नाही." वगैरे गयावया करू लागला. बिऱ्हाडी आलो. त्याने आंघोळ केली, जेवला आणि आमच्या शेजारी बेडिंग पसरून झोपला.
प्रवासाचा शीण, त्यातच कृष्णाच्या कटकटी, यांमुळे आम्ही डाराडूर झोपलो. पहाटे चार साडेचारच्या सुमाराला रस्त्यावर मोठमोठ्याने भांडण चालल्याचे ऐकून जागे झालो. पहातो तो काय ? एक मुसलमान टांगेवाला अपटुडेट ड्रेस घातलेल्या कृष्णाशी अगदी वर्दळीवर येऊन भांडत होता. प्रकरण अगदी कृष्णाचा टाय पकडण्यापर्यंत आले होते. मी पुढे जाऊन काय आहे काय ही भानगड ?" विचारता, तो टांगेवाला चवताळून म्हणाला- साहेब, बघाना, दहा वाजल्यापासून आता साडेचार वाजेपर्यंत याने टांगा वापरला आणि हातात टिकवतो फक्त एक रुपया." यावर कृष्णाचा खुलासा काय ? तर म्हणे जेवढा खिशात शिल्लक राहिला तेवढा देतो. तर हा घेत नाही. मी दहा रुपयांची नोट काढून टांगेवाल्याला दिली नि प्रकरण मिटवले. लगेचे लख्याला ओरडून सांगितले. "लख्या चल आटप आपले बाडबिस्तर आत्ता ६ च्या बोटीने जायचे आपल्याला मुंबईला." कृष्णाने थोबाड बडवून घेतले. पुन्हा आणा शपथा. झक मारली आणि या छंगीफंगी दोस्ताच्या नादी लागून परक्या देशात आलो, असे मला झालं. माझा संताप मलाच अनावर झाला आणि कृष्णाची खूप खरडपट्टी काढली.
त्याचा बराच परिणाम झाला आणि पुढे गोव्याच्या अंतर्भागातल्या अनेक खेड्यांतल्या सफरीत कृष्णा बराचसा माणसासारखा वागला. उजाडताच टांगा करून आम्ही ९-१० मैलांवरच्या एका गावी गेलो. ती नावे मात्र आता मुळीच आठवत नाहीत. आम्हांला पहाताच एक लंगोटी नेसलेला किरिस्ताव आमच्या स्वागताला पुढे आला. लाकडी फळ्याच्या झोपडीवजा त्याच्या रहात्या घरी आम्हांला तो घेऊन गेला. माळ्यावर आमची सोय केली. जागा स्वच्छ नि प्रशस्त होती. चहापाणी झाल्यावर त्याने कोकणीत विचारावे आणि लख्याने आमचे उत्तर त्याला सांगावे, असा द्राविडी प्रयोग चालू झाला. संबंध फिरतीभर हेच चालले होते. मराठी किंवा इंग्रेजी शब्द कानांवरच पडेना. त्याच्या बायको मुलांचा परिचय झाला. आम्हाला त्यांनी अगदी घरच्या अगत्याने वागविले. या किरिस्ताव स्नेह्याला बरोबर घेऊन दोन तीन दिवस आम्ही, कधी टांगा, कधी होडी, कधी प्रवाश्यांनी गजबजलेला मचवा, अशा मार्गांनी अनेक खेड्यात नि जंगलात फिरून खाणींच्या चौकशा केल्या. सौदेबाजीत मी मुळीच लक्ष घालीत नसे. तो कपाळशूळ कृष्णाच्या माथी थापला होता. मी आजूबाजूच्या सृष्टीसौंदर्याचे मनसोक्त निरीक्षण करीत होतो. होडी, टांगा अथवा मचवा (वाफोर) कोणत्या का दिशेने जावो, आपण चारी बाजूला कोठेही नजर टाकली तरी समोर चर्चचा क्रॉसवाला सुळका हमखास नजरेला पडायचाच. जिकडे पहाल तिकडे चर्चेच चर्चे.
तीन दिवसांनी आम्ही त्या किरिस्तावाचा निरोप घेऊन बाळासाहेब राण्यांच्या गावाकडे व्हिक्टोरिया ठरवून निघालो. ते गाव बहुतेक साखळी असावेसे वाटते. पल्ला बराच लांबचा होता. वाटेत एका खानावळीत भरपूर पैसे देऊनही कसले तरी भात आमटीचे जेवण उरकले नि पुढे निघालो. ऊन्ह चांगले कडाडले होते. रस्त्यावरचा फुपाटा उडवीत आमची गाडी चालली होती. एकदम गाडीवाला गाडी थांबवून म्हणाला- साब, वो देखो, बालासाहेब रानेही टेकडीपर दिख पड़ते है". कशावरून ! विचारता, म्हणाला "हा साब, वही तो है. ए देखो ना, उन्का घोडा बांध रखा है ये पेड़के छावमे." डाव्या बाजूच्या टेकडीवर आम्हांला दोन माणसे दिसत होती. गाडीवाल्याने रुमाल हालवून खूण केली. त्या दोघांनीही हाताने जाब दिला. थोडयाच वेळात ते जवळ आले..
मस्तकावर छोटासा शेमला सोडलेला पांढरा फेटा, मानेलगत कापलेले केस व्यवस्थित रुळताहेत, अंगात सदरा नि शॉर्ट कोट, कास मारलेले धोतर, हातात एक छडी, अशा थाटाने स्वागताचे स्मितहास्य करीत बाळासाहेब आणि त्यांच्या बरोबरचा नोकर गाडीजवळ येताच उतरून आम्ही त्यांना नमस्कार केला. “मुंबईहून आलात वाटतं.” (गोव्यात ऐकलेला हाच पहिला मराठी शब्द. मायबोली ऐकण्यात केवढा आनंद असतां ? अगदी वर्णनातीत !) मी कृष्णाजवळचे आदल्या रात्री काढून घेतलेले राण्यांचे पत्र त्यांना दिले." मलाही आले होते पत्र. चला आमच्या गावी." राणे घोड्यावर स्वार होऊन आमच्या गाडीबरोबर चालू लागले. त्यांचा नोकर मागे धावत चालला होता. साधारण दीडदोन मैल गेल्यावर, बाळासाहेब म्हणाले -"जरा उतराल का खाली? त्या तिथे जाऊ या थोडा वेळ."
आम्ही आडवाटेला अर्धा फर्लांग गेलो. तेथे एका झाडाखाली दगडांची रास होती. त्यावर बारीकबारीक पुष्कळच काटक्यांवर चींध्यांच्या निशाणे लावून ती खोचलेली होती. प्रथम आदराचा अगदी वाकून मुजरा करून ते म्हणाले येथे आमचे बंधुराज फिरंग्यांशी लढता लढता धारातीर्थी पडले. त्यांची ही समाधी भाविक लोक येथे ही निशाणे खोचून नवस करतात. जिथे जिथे कुरुस असेल तिथं तिथे तुळशीचे वृंदावन लावणार आणि गोव्यातून फिरंग्यांचा काटा काढणार, या प्रतिज्ञेने राणे घराण्यांनी आजवर अनेक बंडे केली. त्यात हा एक वीर इथं मोक्षाला गेला." आम्हीही आदराने मुजरे केले. डोळे भरगच्च पाणावले. तेथून राण्यांच्या वाड्यांत आमची राजेशाही सरबराई ठेवण्यात आली. दुसऱ्या दिवशी राण्यांनी बोलावून आणलेल्या २-३ खेडूतांबरोबर आम्ही पुढे आणखी खेडयात खाणजागेच्या सौद्यासाठी फिरत होतो. असे पंधरा दिवस गेल्यावर पणजीला एका सायंकाळी येऊन ठेपलो. लगेच कृष्णा रेल्वेने बेळगावला निघून गेला. आता मी आणि लख्याच काय ते मुंबईला परतायचे.
एवढे मोठे राजधानीचे शहर प्रथम आलो तेव्हा केवढी गडबड वर्दळ आणि धामधूम पण आज पाहतो तो सायंकाळची ४ ची वेळ, तरी जिकडे तिकडे सामसूम आहे काय हा प्रकार. चौकशी करता कळले की आज किरिस्तावांचा शिमगा आहे. धुळवडीसारखाच प्रकार. आम्ही चौपाटीवर जात होतो. मागून एक गलेलठ्ठ गोरा फिरंगी डुलत डुलत येत होता. त्याने आगपेट्यांची टवकळे शिवलेला कफानीसारखा एक झगा, एक तशीच विदुषकी उंच कळसाची टोपी घातलेली आणि पाठीवर रंगीत कागदांतले नारळाएवढे वाळूचे चेंडू भरलेली पिशवी. कसल्या तरी रोखाने तो इमारतींच्या खिडक्यावर टेहळणी करीत चालला होता. एका खिडकीतून एक गोरी बाई डोकावून पहातेसे दिसताच त्या पठ्ठ्याने दिला भिरकावून एक वाळूचा चेंडू त्या खिडकीत .खिडकी थाडकन् लागली नि वाळूचा चेंडू फुटून सगळीकडे वाळू फैलावली. थोड्या वेळाने वाजतगाजत एक मिरवणूक येताना दिसली. काळ्या कपड्यांचा बनवलेला एक मोठाथोरला लांब मानेचा उंट. खाली काळ्या पाटलोणी घातलेल्या दोघांनी तो डोक्यावर धरलेला. उंटच जणू चार पायांनी चालत आहे, असा देखावा, बैंडवादनावर स्त्रीपुरुष नाचत खिदळत आहेत. अंदाजे हजारावर लोकांची ती मिरवणूक.
मुंबईची बोट रात्री ११ वाजता निघणार होती. पनवेलला घरी तार करावी, म्हणून तार हापीस शोधीत निधालो. एका मोठ्या इमारतीवर टेलिग्राफो सेंट्राल ही व्हाईटवे थाटाची अक्षरे पाहून लख्यासह आत घुसलो. ममईकराच्या ऐटीत आम्ही तेथल्या गोऱ्या कामगारांना म्हटले- आय वॉन्ट टु सेण्ड ए टेलिग्राम टु बॉम्बे. फाडकन त्याने पुर्तुगेजमध्ये आमच्या तोंडावर जबाब फेकला, तो काय कळणार मला डोंबल! लख्या सरसावला नि त्याने कोकणीत विचारपूस केली. तेव्हा उमगले का ब्रिटिश सरकारचे तारखाते अमक्या ठिकाणी आहे. तिकडे गेलो.
आहाहा, ‘गवर्नमेन्ट पोष्ट अॅण्ड टेलिग्राफ ऑफिस’ ही इंग्रेजी कमानदार पाटी पहाताच काहीतरी हरवलेले गवसल्याचा आनंद झाला. आता जातो तो मास्तर मराठीत बोलणारे रत्नागिरीचे जोशी त्यांनी तार केली. घरातल्या मंडळींना हाका मारून परिचयाचा ब्रह्मानंद लुटला." येथे मराठी माणसाची बदली म्हणजे काळेपाण्याची शिक्षा. कोकणी पुर्तुगेज भाषेने कान किटतात, मराठी शब्द कानावर येत नाही. मराठी भाईबंद भेटले का होणारा आनंद काय वर्णावा ?" मास्तर म्हणत होते ही झाली माझ्या सन १९०४ सालच्या गोवा सफरीची कथा.
१९२६ सालची गोव्याची दुसरी सफर
सन १९२६ मुक्काम पुणे. यावेळी प्रबोधन मासिकाचा गोव्यात प्रसार पुष्कळ होता. प्रबोधनाने मागास नि दलित वर्गाच्या हितवादाचा हिरिरीने धोशा चालविला होता. साहजिकच गोव्यातील जागृत मराठा गायक समाजाला प्रबोधनाचे आकर्षण विशेष वाटू लागले. आपल्या समाजाच्या सामाजिक आणि विशेषतः नैतिक उत्कर्षाचा प्रश्न प्रबोधनातून जिद्दीने चोखाळला जावा या हेतूने तिकडील त्या समाजातल्या कित्येक तरुण पुढाऱ्यांनी पुण्यात अनेक वेळा माझ्या भेटी घेतल्या. त्या समाजातील महिलांची आचारविचार क्रांती व्हावी एवढ्यासाठी मी गोव्यात व्याख्यानांचा दौरा काढावा असा त्यांनी सारखा आग्रह चालविला. माझी मान्यता मिळताच मोतीराम जांबावलीकर, कांत जांबावलीकर, काकोडकर (एवढीच नावे सध्या आठवतात) वगैरे १५-२० तरुणांनी काकोडे येथे ‘मराठा गायक समाज’ परिषद भरविण्याची योजना आखली आणि अध्यक्ष म्हणून माझी योजना केली.
परिषदेचा दिवस ठरला आणि मी पूना बंगलोर मेलने निघालो. पहिला मुक्काम बेळगावचा. स्टेशनवर डॉ. गोविंदराव कोवाडकर प्रभृती पाच-सहा मंडळी स्वागतासाठी आली होती. माझा मुक्काम डॉ. कोवाडकरांच्या येथेच होता. पहातो तो गोव्याहून तेथे आलेल्या मंडळीचे चेहरे उतरलेले! काय झाले म्हणून विचारताच "पुर्तुगेज सरकारने म्हणे परिषदेवर बंदी घातली आणि परिषदेसाठी उभारलेल्या मंडपाला पोलिसांनी वेढा घातला आहे." यावर चर्चा होत असताना असा मुद्दा निघाला की, ही परिषद वेश्याव्यवसायाला प्रतिबंध करण्यासाठी आणि त्या दिशेने गोव्यात मोठे आंदोलन उभारण्यासाठी मराठा गायक समाजाने प्रबोधनकार ठाकरेसारख्या ज्वलज्जहाल चळवळयाला बोलावले आहे. अशा तक्रारी गोव्यातीलच काही शिष्ठ मंडळींनी थेट गव्हर्नादोर जेराल यांच्याकडे केल्यामुळे, ही परिषद-बंदी करण्यात आली आहे. परिणामी मी पुढे गोव्याला न जाता पुण्याला परत जावे, असे उदास चेहरेवाल्यांचे म्हणणे पडले मी म्हणालो "हे पहा मंडळी, एकदा पुढे टाकलेले पाऊल मागे घेण्याची माझी पिंडप्रकृतीच नाही. मी पुढे जाणार. परिणामाची मला पर्वा नाही. अहो, तुमच्या सरकारने परिषदेला बंदी घातली, पण शिवजयंती उत्सव साजरा करायला आणि तेथे व्याख्याने द्यायला तर कायद्याची बदी नाही ना? तीही असेल किंवा आपण तेथे गेल्यावर घातली गेली तरीही श्री समर्थ रामदासांच्या दासबोधावर ठिकठिकाणी पुराणे झोडायला तर काही हरकत नाही ना? त्या पुराणातूनही आपल्या हेतूचा प्रचार खास करता येईल. चला, पुण्याचा एक पुराणिक म्हणून मी येथून निघणार." या माझ्या निश्चयाने गोवेकर मंडळींचे चेहरे फुलारले आणि त्यांनी माझा गोव्याचा दौरा यथासांग पार पाडण्याच्या प्रतिज्ञा केल्या. गोव्याला तशा ताराही धाडण्यात आल्या.
‘रेल्वे मराठे’ एक थोर समाजसेवक
दुसरे दिवशी सकाळी लोंढामार्गे आम्ही सगळे गोव्याला निघालो. लोंढ्याला गाडी बदलावी लागते. लोंढा स्टेशनवरील उपहारगृहाची स्वच्छता आणि टापटीप पहाताच मला आपोआप ‘’रेल्वे मराठे’ या रेल्वे प्रवाशांच्या एकनिष्ठ सेवकाची आठवण झाली. रेल्वे मराठे! आज त्या बिचाऱ्याचे नावही कोणाच्या आठवणीत राहिलेले नाही रेल्वे मराठे बेळगावचे रहिवाशी पण बेटा घरी कधी सापडायचा नाही. उजाडल्यापासून मध्यरात्रपर्यंत रेल्वे प्रवाशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि तेवढ्यासाठी ठिकठिकाणच्या रेल्वे अधिकाऱ्यांचा हात धरून जाब विचारण्यासाठी मिरज ते लोंढा कोणत्या ना कोणत्या गाडीत रेल्वे मराठ्याची सफर चाललेलीच असायची. पूर्वी सदर्न मराठ्यावरील उपहारगृहे अत्यंत गलिच्छ आणि अस्वच्छ असायची. रेल्वे अधिकाऱ्याच्या गाठीभेटी घेऊन रेल्वे मराठे यांनी त्या उपहारगृहांची आरपार सुधारणा केली. एखाद्या उपहारगृहात एखादे घाणेरडे खाद्य किंवा पेय त्याला दिसले का बेधडक तो ते स्वतः उचलून उकिरड्यावर फेकून देत असे. रेल्वे मराठे याची ही एकनिष्ट सेवा पाहून सदर्न मराठ्याच्या मद्रास कचेरीने त्याला फुकट प्रवासाचा तिसऱ्या वर्गाचा पास बहाल केला होता. रेल्वे मराठे स्वभावाने शांत, मनमिळाऊ आणि पडेल ते कष्टाचे काम हसतमुखाने करणारा असल्यामुळे, रेल्वे प्रवाशांना तो आपल्या जिवलग दोस्तासारखा वाटायचा. वरचेवर तो पुण्यास माझ्याकडे यायचा. प्रवासाविषयी रेल्वेच्या कायद्याची साधारण साक्षर माणसालाही माहिती असावी म्हणून त्याने माझ्याकडून रेल्वे प्रवाशांचा माहीतगार या नावाचे एक मराठी चोपडे लिहून घेतले. त्याच्या प्रती तो आपल्या दैनिक रेल्वेप्रवासात एक आणा किमतीला विकायचा, जो जो त्याला कोठेही भेटला तो त्याचा एकदम मित्र व्हायचा अशा हजारो मित्रांची नावे पत्ते त्या या स्मरणवहीत टिपलेली (असायची त्याला आणखी एक नाद होता. दररोज कोणाला ना कोणाला तरी एक कार्ड लिहून पाठवायचे हे त्याचे रोजचे टपाल किमान डझन दीन डझन काढचे असायचेच, या नादाबद्दल एकदा त्याला मी हटकले. तेव्हा तो म्हणाला. " अहो, जुळलेल्या स्नेहाची साखळी ही पत्रे घासून पुसून लख्ख ठेवतात. असा हा एक चीर समाजसेवक लोकांच्या आठवणीतही शिल्लक उरू नये, याचे मला नेहमी वाईट वाटत असते.
पुर्तुगेजांच्या रेल्वेत बसताना उपहारगृहाला जेवणाचे ताट पाठविण्याची आर्डर दिली. पांढऱ्याफेक रुमालाने झाकलेले जेवणाचे ताट आणि पाणी भरलेला तांब्या रामपात्र घेऊन एक सेवक डब्यात आला. जेवणाचा बेत पहाताच मी त्याला म्हटले, " अरे वा! तुमची व्यवस्था फार छान दिसते." त्यावर तो म्हणाला " साहेब हा सगळा आमच्या रेल्वे मराठे साहेबांचा खटाटोप आहे. ते मेहनत घेतात, टेहळणीवर मिरजेपासून सारखे फिरतात. म्हणून ही व्यवस्था चालली आहे." गाडी सुटण्याची घंटा वाजली तेव्हा तो सेवक म्हणाला, "साहेब गाडी चालू झाली तरी हरकत नाही. तुम्ही खुशाल सावकाश जेवा. पुढच्या कोणत्याही स्टेशनवर आमचा माणूस येऊन ताट तांब्या घेऊन जाईल. पैसे त्यालाच द्या."
पुर्तुगेज प्रवासाची मजा
कॅसलरॉकपर्यंत ब्रिटिशांची हद्द पुढे पुर्तुगेज सरकारची. कोळे (Collem) ठेसनावर गाडी आली. एकदम खाली उतरा, डबा रिकामा करा ओरडत हमाल फिरू लागले. हे काय प्रकरण आहे ते मला कळेना. पण गोव्याहून २-३ मंडळी मुद्दाम कोळे स्टेशनवर आगाऊ स्वागतासाठी आली होती. ती मला भेटली. येथे खाली उतरले पाहिजे असे त्यांनी मला सांगितले. येथपासून कोकणी भाषा सारखी कानावर आदळू लागली. डब्यातले आम्ही उतारू खाली उतरणार तोच एक दोक्तार (डॉक्टर) दरवाजात खडा उभा. तो फटाफट एकेकाचे मनगट धरी आणि त्याला ताप वगैरे आहे की काय हे पाहून खाली सोडी. उतारांनी सगळा फलाट गजबजून गेला. मी आलेल्या मित्राबरोबर चहा घेण्यासाठी कॅन्टिनकडे गेली. गाडी सुटायला एक तास तरी लागेल म्हणून आम्ही गप्पा मारीत फलाटावर फिरू लागलो. पहातो तो सगळे रेल्वेचे हमाल प्रत्येक डब्यात घुसून उतारूच्या ट्रंका, टोपल्या, बेडिंग भराभर बाहेर काढून कोठेतरी घेऊन जात आहेत. माझीही बॅग आणि बेडिंग असेच जाताना मी पाहिले. हा काय प्रकार आहे काही कळेना. तेव्हा मोतीरामने खुलासा केला, "हे असेच चालते येथे उतारांचे सगळे सामान पलीकडे एका मोठ्या कोठारवजा खोलीत नेऊन ठेवतात सामानांनी ते कोठार भरगच्च भरले म्हणजे त्याचे दरवाजे बंद करतात आणि एका नळातून जंतुविनाशक गॅसचा धूर त्या खोलीत सोडला जातो. धुराने कोठार भरले की त्या वरच्या चिमणीतून धूर बाहेर पडू लागतो. एवढे झाले का धूर बंद करून १०-१५ मिनिटांनी दरवाजा उघडून ते सारे सामान बाहेर ढिगारा करून ठेवण्यात येते. त्या ढिगाऱ्यातून ज्याने त्याने आपले सामान हुडकून काढावे असा येथला थाट आहे." का करतात ?" मी विचारले. अहो ब्रिटिश हद्दीतून आमच्या पुर्तुगेज हद्दीत उतारूंबरोबर किंवा त्यांच्या सामानाबरोबर काही रोगजंतू येऊन आमच्या पुर्तुगेज हद्दीतील क्रिस्ताची पवित्र हवा बिघडू नये म्हणून हा सारा उपद्व्याप !" आम्ही हमालाकडून आमचे लगेज हुडकून काढले. सगळाच अस्ताव्यस्त कारभार, बैंग इकडे तर बेडिंगची वळकटी भलतीकडेच आम्ही डब्याजवळ येतो तो काय! सगळा डबा फिनाईलच्या पाण्याने आरपार धुऊन काढलेला. हे निथळते पाणी आता पुसायचे कसे आणि कोणी ? तेथले डोकेबाज हमाल मोठे धोरणी. हातावर चवली ठेवताच खांद्यावरच्या रुमालाने बसायची बाके पुसून स्वच्छ. आमचे उतरण्याचे स्टेशन सायडे (Sanvordem) आले. स्वागतासाठी आलेली बरीच मंडळी भेटली. पण तेथे एक विधी व्हायचा होता. त्यावेळी मेननजायटीसची साथ चालू होती. गेटजवळच एक टेबल मांडून त्यावर स्पिरिटच्या दिव्यावर टिनचा पत्रा तापत ठेवला होता. त्यावर कसले तरी औषध टाकून त्याचा धूर प्रत्येक उतारूच्या नाकात कोंबण्याचे काम एक दोक्तार करीत होता. हा धूर हुंगण्याचा विधी झाल्याशिवाय कोणालाही स्टेशनबाहेर पडता येत नसे. मी तो धूर हुंगला आणि मित्रासमवेत बाहेर पडलो.
सावर्डेला पुणेकर भेटला
स्वागतासाठी आलेल्या मंडळींबरोबर मी स्टेशनबाहेर पडतो तोच एक क्रिश्चन तरुण आला. आणि माझ्याशी शेकहँड करीत म्हणाला, "आपण पुण्याचे, मीही पुण्याचा. पुना ड्रग स्टोअर्सच्या मालकाचा मुलगा. आपण इथे आलात I am very glad." स्टेशनजवळच त्याचे एक छोटे दुकान होते. त्याने आम्हा सगळ्यांना तेथे नेले आणि कोल्ड ड्रिंकची छोटी मेजवानी दिली. तेथून आम्हांला जायचे होते काकोड्याला. काही मंडळी वाहनाचा शोध करू लागली. पण ते मिळेना. चौकशी करता सावर्डे आणि काकोडे यांत दादर माटुंग्याचे अंतर होते." असं जर आहे तर चला आपण सारे पायी चालत जाऊ." असे मी सांगताच आम्ही सर्व सावडहून काकोडाला रवाना झालो.
तेथे जाताच परिषदेसाठी घातलेल्या मांडवाला ४०-५० पुर्तुगेज पोलिसांचा गराडा पडलेला. शेजारच्या एका घरात माझ्या छावणीची व्यवस्था केली होती. परिषदेसाठी ‘पुण्याहून येणारा पाहुणा’ आल्याचे पहाताच पोलिसांत चलबिचल उडाली. ते सारे उठले नि मांडवाला प्रदक्षिणेचा पहारा देऊ. लागले, वास्तविक मंडपात कसलेच काही फर्निचर नव्हते. तो अगदी रिकामा होता. पण त्याला घेरे मारून पहारा करणाऱ्या त्या पोलिसांची कीव आली. कदाचित त्यांना असे वाटले असावे का आता जमलेले हे सारे लोक पुण्याच्या पाहुण्याला घेऊन मंडपात घुसतील आणि परिषद चालू करतील. परिषद म्हणजे पटकन काडी पेटवून चटकन विडी ओढण्याइतके सोपे काम, अशी त्या येडपटांची समजूत झाली असावी. मंडपाजवळ आतापर्यंत ठाण मांडून बसलेले पोलीस एकदम उठून घाण्याच्या बैलासारखे मंडपाभोवती गरगर फिरू लागलेले पहाताच त्यांचा एक अधिकारी कुठूनतरी धावतपळत आला आणि माझ्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना दटावून कोकणीत म्हणाला, "आत्ताच्या आत्ता हा मंडप मोडून टाकला नाहीत तर तो आम्ही मोडून टाकू " मंडळी म्हणाली "
आम्ही मोडणार नाही. तुम्ही हवा तर मोडा." यावर थोडी बाचाबाची झाली आणि पोलिसांनी भराभर मांडव मोडला आणि निघून गेले. कंत्राटदार शेजारीच उभा होता. त्याने एक खटारा आणला आणि सारे सामान त्यात भरून निघून गेला. जाताना मिस्किलपणे हसत तो म्हणाला, "मांडव मोडण्याचा माझा खर्च वाचला !"
दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता एका इमारतीतील (हे एक देऊळ असावे) हॉलमध्ये महिलांची सभा घेतली. ४०-५० महिला आल्या होत्या. शिवचरित्र आणि मराठ्यांचा इतिहास यावर मी खुर्चीवर बसून पुराणवजा प्रवचन एक तासभर केले. प्रवचनाचा मुख्य गाभा, राष्ट्राच्या उन्नतीसाठी आणि समाजधारणेसाठी निष्कलंक नीतिवान स्त्रियांची आवश्यकता हा होता. बहुतेक महिला मला सुशिक्षित आढळल्या. महाराष्ट्रात आणि मुंबईत प्रसिद्ध होणाऱ्या अनेक मासिकाचे अंक मला घरोघर आढळले. एकमेकीत त्या जरी कोकणीत बोलत असत, तरी माझ्याशी बोलताना स्वच्छ मराठीत बोलत होत्या. मी ४-५ घरांना भेटी दिल्या. एका घरी मासिक मनोरंजनाचा १ला दिवाळी अंक उत्तम कव्हर घालून बांधलेला आढळला. मी म्हटले, "वा, हा मनोरंजनाचा अंक तुम्ही अगदी जपून ठेवलाय !" त्यावर ती बाई म्हणाली, "त्यात कितीतरी आमच्या गोंयकार मोठ्या माणसांची चित्र छापलेली आहेत ना. म्हणून ठेवलाय जपून." तेथल्या अनेक तरुणीशी केलेल्या भाषणाप्रसंगात मला असे आढळून आले की बहुतेकींना आपल्या परंपरागत रूढ जीवनाची किळस आलेली होती. इतर समाजाप्रमाणे वैवाहिक जीवनाचा मार्ग जितक्या लवकर सापडेल तितका बरा असे त्या कळवळून सांगत, या बाबतीत मुख्य अडसर म्हणजे जुन्या आचारविचारानी ग्रस्त झालेल्या त्यांच्या माता आणि त्यांना बहकविणारे, इतकंच नव्हे तर चिथावणी देणारे आजूबाजूचे शेकडो शिष्ट, त्यांच्यातीलच काही विचारवंत तरुणांनी मराठा गायक समाज स्थापन करून अनैतिक जीवनाची कोंडी फोडण्याचे जे प्रयत्न चालविले आहेत तिकडे त्या आशेने आणि आदराने पहात होत्या.
आठवणीप्रमाणे मी १०-१२ ठिकाणी शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने प्रवचनाच्या बैठकी घेतल्या. मडगावला गेलो असताना तेथे अचानक माझे पत्रस्नेही कै. दत्ता पै भेटले. मी हाती घेतलेल्या उद्योगाची वाहवा करून, तेथील सारस्वत समाजाच्या मंदिरात एक व्याख्यान देण्याचा त्यांनी आग्रह केला. माझा पणजीचा कार्यक्रम आधीच ठरलेला असल्यामुळे पणजीचा दौरा पुरा करून मडगावला येताच तुमच्या निमंत्रणाचा मान राखतो, असे सांगून मी पणजीला रवाना झालो. वाटेत एकदोन ठिकाणी `वाफोर’ म्हणजे मचव्यातून खाडी ओलांडावी लागली. किनाऱ्यावर उतरताच तेथेही दोक्तार आणि ती औषधहुंगणी बिनचूक हजर! पणजीला आमचा कंपू एका न्हावी गृहस्थाच्या घरी छावणीला गेला. त्यावेळी पणजीला गोड्या पाण्याचा फार दुष्काळ होता. चार आण्याला एक घागर विकत घ्यावी लागे. भर उन्हात मोटारदौडीच्या प्रवासाने आम्ही तेथे गेल्यामुळे स्वच्छ आंघोळ केल्याशिवाय आमची सुटकाच नव्हती. आणि पणजीला तर गोड्या पाण्याचा दुष्काळ! त्या सज्जन यजमानाने आमची अडचण हेरून तात्काळ १०-१२ घागरी पाणी पडेल त्या किंमतीला मागविण्याची तरतूद केली. त्यादिवशी रात्री ८ वाजता पणजीत शिवचरित्रावर व्याख्यान ठरले होते. त्याप्रमाणे हस्तपत्रिकांचाही दिवसभर प्रचार चालला होता. अल्पोपहारानंतर ठरल्यावेळी आम्ही सभास्थानी गेलो. पहातो तो तेथे मराठी मंडळींपेक्षा बहुसंख्य आबालवृद्ध क्रिश्चन स्त्रीपुरुषांची गर्दी बरीच माझ्यापुढे प्रश्न पडला. कोकणी तर मला येत नाही. मराठीत बोललो तर या क्रिश्चन मंडळींना ते समजेल का नाही? सुरुवातीलाच मी इंग्रेजीतून विचारले, " भगिनी बांधवहो. शिवरायाचे चरित्र सांगण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. मला कोकणी भाषा येत नाही. आपल्याला मराठी भाषा समजते की नाही मला ठाऊक नाही. आपली इच्छा असेल तर मी इंग्रेजीतही व्याख्यान देऊ शकतो." त्यावर पांढऱ्या शुभ्र भरघोस दाढीमिशाचा एक वृद्ध क्रिश्चन गृहस्थ उभा राहून स्वच्छ मराठीत म्हणाला, "ठाकरेसाहेब आपण मराठीतच बोला. आम्हांला मराठी चांगले समजते. आम्ही मराठी बुके पण वाचतो." तेथे माझे दोन तास भाषण झाले. शिवचरित्रातल्या पराक्रमाच्या आणि लढायांच्या मनोरंजक हकिकती ऐकून श्रोत्यांतून वरचेवर ‘ब्रॅव्हो’च्या आरोळ्या उठत होत्या. शिवचरित्रावर पणजीतच आणखी तीन व्याख्याने देऊन मी मडगावला परतणार होतो. पण इतक्यातच पणजीतल्या मराठा गायक समाजातील काही पुढाऱ्यांनी एक बेत केला. वेश्या व्यवसायाला कायमची मूठमाती द्यायची असेल तर शेसविधीची रूढी कायद्याने बंद करून, तो फौजदारी गुन्हा ठरविण्याची गोवा सरकारकडे काही खटपट केली पाहिजे यासाठी तेथील गव्हर्नादोर जिराल (गव्हर्नर जनरल) कडे माझ्या पुढारपणाखाली डेप्युटेशन नेण्याचे ठरले. दोघातिघानी खटपट करून हुजूरच्या भेटीची वेळ ठरवून घेतली. त्याप्रमाणे मी आणि माझ्याबरोबर ७-८ जण असे गव्हर्नादोर जिरालच्या निवासस्थानी भेटीला गेले.
आमच्याबरोबर आलेल्या पणजीतल्या एका थोर पुढाऱ्याने आमचा सगळ्यांचा परिचय साहेबाला कोकणीत करून दिला. त्या गव्हर्नराला कोकणी समजत होते व तो बोलतही होता. मी मुंबईहून आलेला एक समाजसुधारक अशी प्रस्तावना केलेली ऐकताच साहेब उद्गारले "यू बोम्बाय कम्! व्हेरी गुद्.” त्यावर मी इंग्रेजीत म्हणालो, "सर मला कोकणी येत नाही मी इंग्रेजीत बोललो तर चालेल काय? त्यावर तो म्हणाला. ‘`आय अंदरस्ताद इंग्लिश, यू स्पीक.” गोव्यात रूढ असलेला गलिच्छ वेश्याव्यवसाय कायमचा बंद पाडण्यासाठी आपल्या सरकारने शेसविधी हा क्रिमिनल ऑफेन्स ठरवावा अशी आमची प्रार्थना आहे." असे मी सांगितले त्यावर साहेब म्हणाले, "दिसीज रिपूब्लिक मेम्बर ब्रींग बिल, गवमेत नो अब्जेक्सन." नंतर आम्ही त्यांच्या ‘रिपूब्लीक’च्या मेम्बरांच्या गाठीभेटी घेऊन त्या दिशेने शेसविधी प्रतिबंधक बिल आणण्याची खटपट करणारे पाच जणांचे मंडळ नेमले.
तेथून आम्ही मडगावला आलो. तेथे सारस्वत समाज मंदिरात संध्याकाळी ६ वाजता ‘हिंदु मिशनरी चळवळ काय आहे?’ या विषयावर दत्ता पै यांनी माझे व्याख्यान ठरविले होते. पण मडगावला पोचायलाच आम्हांला उशीर झाला. ७ वाजले. सभागृह ६ वाजताच तुडुंब भरले होते. दत्ता पै बिचारा आमच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. आमच्या गाड्या येताच
"एक तास झाला. लोक ताटकळत बसले आहेत. आहात तसे चला" असे म्हणून तो मला समाजमंदिरात घेऊन गेला. सारस्वत समाजातील मोठमोठी शिष्ठमंडळी बनातीच्या तांबड्या टोप्या घालून आली होती. वक्त्यासाठी शाळेतल्या मुलाची बसण्या-लिहिण्याची छोटी टेबले असतात तसे एक स्वतंत्र सिमेंटी व्यासपीठ तयार होते. कै. गजानन भास्कर वैद्य यांनी स्थापन केलेल्या हिंदू-मिशनरी सोसायटीने परधर्मांत बाटलेल्या भगिनी बांधवांना हिंदू धर्मात प्रतिष्ठेने परत घेण्याची चळवळ कशी केली. याचा सर्व तपशील मी सांगितला. हारतुरे, आभार, अल्पोपहार वगैरे विधी आटोपला आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या गाडीने आम्ही सावर्ड्याला आलो आणि तेथून पुढे लोंढामार्गे पुण्याला रवाना झालो. गोव्याच्या काही समंजस पुढाऱ्याच्या प्रयत्नाने काही वर्षांपूर्वीच शेसविधी हा फौजदारी गुन्हा ठरविण्यात आला. हे मी केलेल्या प्रयत्नांत बीजारोपणालाआलेले उत्तम फळ असे मी मानले, तर त्यात काही चूक तर होणार नाही ना ?
प्रकरण १८
पुणे सोडले, दादरला आलो
लोकमान्यांच्या अवसानानंतर पुण्याचा आणि राजकारणाचा काहीच संबंध राहिला नाही. राजकारण नावाखाली पुणेकर जे ‘राजकारण’ चालवतात त्याचे खरे स्वरूप म्हणजे ‘नागडा उघडा’ जातीयवाद. त्या वादाला कंटाळून म्हणजे त्या वादाचा कडवा उपसर्ग भोगून मी पुण्याला रामराम ठोकला. छापखाना बंद करून दादरला आलो. बावीस वर्षे रहात असलेला मिरांडा चाळीतला माझा ब्लॉक मी माझे मेहुणे कृष्णराव गुप्ते यांना दिलेला असल्यामुळे, दादरला पाऊल ठेवायला जागाच नाही, अशी माझी अवस्था झाली. माझे धाकटे आणि आज दिवंगत असलेले बंधू यशवंतराव यांनी त्यांच्याच बिऱ्हाडात माझी तात्पुरती सोय केली. दुसरे दिवशी संध्याकाळी साहजिकच सौभाग्यवती आपल्या भावाकडे मिरांडा चाळीत जात असताना वाटेत मिरांडा साहेबाची भेट झाली. "काय ताई. केव्हा आलीस? आणि उतरलीस कुठेस?" असे त्याने विचारले. सौ.सध्या खांडके बिल्डिंगमध्ये मिरांडा का? तुझी जागा आहे ना वर? सौ. पपा ती माझ्या भावाला दिली आहे. त्याचाही संसार आहेच ना? मिरांडा : ते काही नाही. माझ्या एवढ्या चाळी असताना तुम्ही दुसरीकडे रहाणार? मिरांडाने ताबडतोब माळ्याला हाक मारून तळमजल्यावरचा दोन खोल्यांचा ब्लॉक व्हाईटवॉश करून तयार करायला सांगितला. सौ.ला मिरांडा म्हणाले " ही तुझी जागा उद्याच्या उद्या इथे बिऱ्हाड घेऊन ये, मी सकाळी येऊन पहातो. अग पोरी, ही चाळ बांधून तयार झाली आणि तुझे लग्न होऊन प्रथम तू पहिलेच बिऱ्हाड म्हणून या जागेत आलीस. २०-२२ वर्स झाली त्याला. तेव्हापासून या मिरांडाने चार नव्या चाळी उठवल्या. पाहिल्यास ना! हा तुझा पायगुण मी विसरणार नाही. दादरला तू माझ्याच चाळीत राहिलं पाहिजेस." आम्ही दहा महिने त्या जागेत राहिलो पण मिरांडाने एक छदामही भाडे आमच्याकडून घेतले नाही. एकदा मी भाड्याचा प्रश्न काढताच माझ्यावर उसळून म्हणाला" तुला काय करायचंय. जागा मी ताईला दिली आहे. तुझा संबंध काय. पुन्हा हा प्रश्न माझ्याजवळ काढू नकोस." अशी जिव्हाळ्याची माणसे चालू जमान्यात भेटतील का कधी कुणाला ?
ज्योतिषांच्या मगरमिठीत
निर्वाहाचे मुख्य साधनच हातचे गेल्यामुळे माझी परिस्थिती बिकट झाली. तिचा गवगवाही बराच झाला. कित्येकांनी तर ठाकऱ्यांचा अवतार संपला अशा सिद्धान्ताचा बकवाही केला. सहानुभूती व्यक्त करणारे जे स्नेही आजूबाजूला जमले, त्यात ज्योतिर्विदांचा भरणा बराच झाला. प्रत्येकाने माझ्या कुंडलीतल्या सप्तग्रह नवग्रहांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. गणिताने कागदांचे तावच्याताव त्यांनी आकड्यांनी भरून काढले. कुंडलीतले ग्रह बेटे असे मिस्किल का ते प्रत्येक ज्योतिषाला निरनिराळे भविष्य सांगू लागले. एकाचा मंगळ उच्चीचा तर दुसऱ्याला गवसला तो नीचीचा, एकाचा गुरू बलवान तर दुसऱ्याचा पेकाट मोडलेला. सगळ्याचे मात्र एकमत की, शनीच्या साडेसातीमुळे मी पावणे आठीच्या भेंडोळयात अडकलो! दररोज सकाळ-संध्याकाळ नवग्रहांचे हे घाऊक अडत्ये खरडलेल्या आकड्यांची बाडे घेऊन माझ्या कानाशी घुंगुरट्याप्रमाणे कान पोखरणीला हजर असत. साडेसातीचा फेरा अपघातातल्या मोटारीप्रमाणे उलथून पाडायला प्रत्येकाचा उपाय निरनिराळा. कोणी म्हणे, मारुतीच्या तेलशेंदूरात बुचकाळी मारा, दुसरा म्हणे, अमुक स्तोत्राची दररोज इतकी पारायणे करा. मला कोणतेच पसंत पडेना. माझा तो पिंडच नव्हे, हो हो म्हणून मी वेळ मारून नेत असे. दिवसगत जात होते. मी मात्र ठिकच्या ठिकाणी, वैतागून गेलो या ज्योतिषांच्या माऱ्यापुढे. पटकन एके दिवशी कुणीतरी यायचा आणि "केशवराव टाळी द्या. एवढा मार्च संपू द्या. काय चमत्कार होतो पहा. भाकित चुकले तर पुन्हा पंचांग हातात धरणार नाही." त्यावर मी वैतागून म्हणायचा, "पंचांग तुमच्या हातात राहो अगर न राहो, पण मार्च संपल्यावर मी मात्र एप्रिल फूल होणार हे निश्चित." माणूस संकटात आला म्हणजे ग्रहदशेच्या फेऱ्यांपेक्षा या ज्योतिषी लोकांच्या फेऱ्यांत किती गाढव बनतो आणि वास्तविक कर्तव्याची वाट चुकतो, याचा मला या काळात भरपूर अनुभव आला.
मुंबईला गिरगावात करंदीकर नावाचे हस्तरेषा परीक्षक होते. तेही एक दिवस आपल्या साहित्यासह भेटीला आले. त्यांनी माझ्या दोन्ही हातांना शाई लावून त्यांचे ठसे घेतले. "लवकरच तुम्हाला परदेशगमनाचा सुयोग आहे; हजारांत असा हात आढळायचा नाही. तुम्ही शनिमहात्म्याचे पारायण करा: सहा महिन्यांत तुम्ही प्रकाशाच्या मार्गात पाऊल ठेवाल." असा त्यांनी दिलासा दिला. मी त्यांना म्हटले, करंदीकर, प्रकाश आणि अंधार यांनाही मर्यादा आहेत. अंधार संपल्यावर प्रकाशच येणार. पण आपण परदेशगमनाचा वर्तविलेला योग मला फारसा खरा वाटत नाही. सांगण्यात तुमची काही चूक तर झाली नाही ना? परदेशगमन का परलोकगमन? आम्ही दोघेही पोटभर हसलो.
शनिमहात्म्य काय आहे ?
करंदीकरांनी शनिमहात्म्याच्या पारायणाचा फारच आग्रह केला. लहानपणी आणि विद्यार्थीदशेत मी शनिमहात्म्य बऱ्याच वेळा वाचले होते. एखाद्या कल्पित कादंबरीपेक्षा मला त्याचे केव्हाही महत्त्व वाटले नाही. तथापि त्या कादंबरीचा चिकित्सक अभ्यास करावा, असे यावेळी मी ठरविले. ते चोपडे वाचून कोणाच्या दैवाच्या उलट्या बसलेल्या कवट्या सुलट्या होतात, यावर माझा विश्वास कधीच बसला नाही. तरीही सत्यशोधक भूमिकेवरून मी त्याचा अभ्यास चालविला. शनिग्रह उज्जनीच्या विक्रम राज्याच्याच बोकांडी बसायला का आला? विक्रम म्हणजे पराक्रम आणि तो उज्जनीचा म्हणे उच्च जनीचा. लोकहितवादी लोकमान्य अशा श्रेष्ठ दर्जाच्या जनसेवकांवरच संकटपरंपरेची कुऱ्हाड त्यांचे सत्त्व पहाण्यासाठी पडत असते, या एकाच सत्य तत्त्वावर तात्याजी महिपतीने शनिमहात्म्य या कादंबरीची उभारणी केली आहे. यापेक्षा त्यात आणखी काही गूढशक्ती असेल किंवा असावी असा तेव्हा आणि आजही माझा विश्वांस नाही. तथापि त्या पुस्तकाच्या अध्ययनाने मनात आलेले विचार पुस्तक लिहून प्रसिद्ध करावे असा बेत केला आणि त्याप्रमाणे रोज भेट द्यायला येणाऱ्या अर्धा डझन ज्योतिर्विदांना उंबरठा-बंदीचा हुकूम सोडून ` शनिमहात्म्य` अथवा `ग्रहदशेच्या फेऱ्याचा उलगडा’ या पुस्तकाचे लेखनकार्य जिद्दीने हाती घेतले.
दादरला निष्कांचन अवस्थेत मी सहकुटुंब रहात आहे, प्रबोधन मासिक लोकहितवादी साप्ताहिक आणि छापखाना बंद पडला आहे ही वार्ता सर्व महाराष्ट्रभर पसरली. ठिकठिकाणच्या प्रबोधनभक्तांची सहानुभूतीची आणि उत्तेजनाची पत्रे रोज येत होती. कित्येकांनी द्रव्यसहाय्यही पाठविले. या सहाय्यकांत श्रीमंतांपेक्षा गोरगरीब, शेतकरी, कामगार वर्गाची संख्या अधिक होती. कित्येक स्थानिक कामगार मंडळी वरचेवर मला भेटायला येऊन अल्पस्वल्प द्रव्यसहाय्यही करीत असत. त्यांत तुकारामजी पुजारी या स्नेहाचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. दर आठ-पंधरा दिवसांनी तुकारामजी आपल्या पाचसहा सवंगड्यांसह अगत्याने मला भेटत असत. मी एक नवीन पुस्तक लिहीत आहे हे पाहून ही मंडळी उत्साहित झाली. तुकारामजी मला म्हणाले, "दादासाहेब, अंधारातून बाहेर येण्याचा हाच खरा मार्ग, तुमच्या लेखणीच्या प्रभावावरच तुमचे सारे भविष्य तेजाळ होणार आहे. प्रयत्न हाच परमेश्वर. ग्रंथलेखन पुरे झाले म्हणजे पुढच्या छपाईची सारी व्यवस्था आमच्याकडे लागली." तुकारामजीसारख्या श्रमजीवी कामगार मंडळींच्या या उत्तेजनाने माझ्या कर्तृत्वाला विलक्षण कलाटणी मिळाली. विचारवंत म्हणून मिरविणानऱ्या माझ्या डोळ्यांत एका श्रमजीवी मित्रमंडळाने प्रयत्नवादाचे चरचरीत अंजन घातले, नव्हे का? पुस्तक लिहून पुरे होण्याच्या आधीच या तुकाराम मंडळाने आगाऊ एक रुपया देणारे एक हजार ग्राहक नोंदविण्याची कामगिरी पुरी केली. माझे स्नेही ठाण्याचे ताम्हाणे बंधू यांनी कागदाची रिंगे पुरविली. काळाचौकी रोडवरील सुप्रसिद्ध औषध विक्रेते कै. गोविंदराव शिंदे यांनी कव्हराचा कागद घेऊन दिला. यावेळी खरोखरच ‘अनंतहस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने’ अशी माझी अवस्था झाली. पुस्तक छापून बाहेर पडले आणि तुकारामजी पुजारी यांनी एकमुठी हजार रुपये माझ्यापुढे ठेवून तेवढ्या प्रती ते घेऊन गेले.
ज्योतिषांच्या भाकिताच्या जाळ्यात सापडून कृतिशून्य प्रयत्नशून्य बसण्यापेक्षा जिद्दीने प्रयत्नांची कसोशी करीत रहाण्यात पुरुषार्थाची सिद्धी असते, हे अट्टहासाने सांगण्यासाठीच मी या कर्मकहाणीचा एवढा प्रपंच केला आहे. मनुष्य कितीही विद्वान असला, कितीही विचारवंत असला तरी संकटाचा एखादा फटका लागताच ज्योतिष्याच्या मोहजालात अडकण्याचा धोका तो टाळू शकतो असे नाही. पण तो टाळलाच पाहिजे. लोकांनी या फंदात पडू नये म्हणून आतातुर्क केमाल पाशाने ‘रमल’ चा धंदा फौजदारी गुन्हा ठरविला. आपल्याकडे केंद्रातही ज्योतिष्याला ठाणदारी लाभलेली आहे. मग इतरांची कथा ती काय ?
दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव
सन १९२६ सालचा गणेशोत्सव ! यावेळी आणि त्यापूर्वी कधीही दादरला किंवा मुंबईला बामण-बामणेतर वाद कसलाच कोठे नव्हता. आणि मुंबईसारख्या “ये रे दिवसा भर रे पोटा” वृत्तीच्या लोकांनी गजबजलेल्या विभागात कसलाही वाद खेळायला लोकांना उसंतच असणार कुठून? शिवाय, दादरला आज जे बकाल मुंबईच्या फादरचे रूप आहे, त्याची त्यावेळी नुकतीच झुंजूमुंजू होत होती. सगळ्याच जाती जमाती पोटार्थी ! आगगाड्यांच्या टाईमटेबलांच्या मुहूर्तावर धावपळ करणारे. अशाही अवस्थेत येथली ब्राह्मण मंडळी मात्र आपल्या जातीय संघटनांचे कार्य सार्वजनिक उत्सवांच्या बुरख्याखाली बिनधोक चालवीत असत. दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव सालोसाल थाटामाटात साजरा व्हायचा. सगळ्या लहानमोठ्या दादरकर जाती जमातीकडून वर्गण्या गोळा व्हायच्या. कोणी ना म्हणायचे नाही. आपल्याला होत नाही. जमत नाही नि दादरकर ब्राह्मण मंडळी पुढाकाराने उत्सव साजरे करतात, अलबत सख्यांनी हातभार लावलाच पाहिजे, अशा समजुतीने लोक वर्गण्या देत असत. पण हा ‘पुढाकार’ इतका बळावला की उत्सवाचे कार्यकारी मंडळ एकजात ब्राह्मणांचे, इतरांचा तेथे शिरकाव नाही. कार्यक्रमासाठी येणारे वक्ते, कवि, शाहीर कीर्तनकार सारी एका पिसाची बामण मंडळी. बरे कुणी गावकऱ्यांनी एखाद्या बामणेतर कवि, वक्ता, शाहिराचे नाव सुचविले तर जो तो कार्यकारी मंडळाच्या हुकमतीकडे बोट दाखवायचा. मंत्रजागर म्हणजे फक्त याच मंडळीची घवघवीत कोजागिरी बामणेतर जागरूक तरुण बारकाईने हे सर्व अभ्यासीत होता. यावेळी स्पृश्यास्पृश्य भेद नस्ट करून अखिल हिंदू जनांची एकजूट एकवटणी करण्यासाठी काही युवक मंडळे निघाली होती आणि त्यांची कामेही चालू झाली होती. सार्वजनिक गणेशोत्सव जर अखिल हिंदूंचा, तर त्यात स्पृश्यांबरोबर अस्पृश्यांनाही भरपूर भाग घेता आला पाहिजे. इतकेच काय, पण कोणत्याही अस्पृश्याला सार्वजनिक उत्सवातल्या गणेश मूर्तीचे पूजन स्वतः करण्याचा हक्क असला पाहिजे, हा विचार बळावला आणि त्याप्रमाणे दादर उत्सवाच्या कार्यकारी मंडळाकडे युवक संघाचा लेखी खलिता रवाना झाला. भलतेच अचाट काहीतरी घडले म्हणायचे! कार्यकारी मंडळाचे नि उत्सवाचे अध्यक्ष होते ‘मशीदफेम’ डॉ. जावळे, म्हणजे त्याकाळचे मेयरपदाकडे दमदार पावले टाकणारे दादरचे कदीम स्टार नागरिक, कार्यकारी मंडळींत एकच गडबड उडाली. इकडे समाज सुधारक युवक मंडळाने पाचशे अस्पृश्य बांधवांकडून प्रत्येकी चार आणे वर्गणी जमवून ती उत्सव कमिटीकडे भरून मेंबरशिपच्या पावत्या आधीच मिळविल्या होत्या. त्या जोरावर "अस्पृश्य समजले जाणारे लोक धर्माने हिंदूच असल्यामुळे, सार्वजनिक म्हणविणाऱ्या गणेशोत्सवाच्या उत्सवमूर्तीचे प्रत्यक्ष शिवून पूजन करण्याचा त्यांना हक्क असलाच पाहिजे, आणि तो आम्ही यंदा सिद्ध करणार." या लेखी धमकीने डॉ. जावळे मंडळ आरपार हादरले. डॉ. आंबेडकरांच्या सूत्रचालनाखाली ठिकठिकाणी चाललेल्या त्या युवक मंडळाच्या जबरदस्त चळवळींची त्यांना चांगलीच कल्पना होती, गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी त्यांनी माहीम पोलीस स्टेशनची एका गोऱ्या सार्जण्टाच्या हुकमतीची पोलीस पार्टी छबिलदास हायस्कूलच्या बांधल्या जात असलेल्या नवीन इमारतीच्या तयार झालेल्या तळमजल्याच्या रिकाम्या जागेत आणून ठेवली होती.
टिळक पुलाच्या दक्षिणेच्या पायथ्याजवळ सगळी जागा रिकामी होती. (आता तेथे इमारती झाल्या आहेत.) त्या मोकळ्या जागेवर उत्सवाचा मोठा मंडप घातलेला होता आणि जवळच एका नवीन इमारतीत, बाहेरून दर्शन घेता येईल अशा दिंडीवजा जागेत, गणपतीचे मखर तयार केले होते. मूर्ती सकाळीच तेथे आणून ठेवली होती. त्याच वेळेपासून टिळक पुलावर स्पृश्य अस्पृश्य तरुणांचे जथ्थ्यावर जथ्थ्ये जमू लागले. सुमारे ८ वाजता रा. ब. बोले तेथे आले. त्यावेळी टिळक पुलावर आत्ताच्यासारखा रहदारीचा तोबा नसे.
मला या प्रकरणाची काहीच माहिती नव्हती. पुण्याहून दादरला आल्यानंतर प्राप्त झालेल्या विपन्नावस्थेची कोडी सोडविण्यात मी गर्क होतो. १० च्या सुमाराला भास्कर कद्रेकर माझ्याकडे धापा टाकीत आला. "पुलावर लोकांचा भला मोठा जमाव गोळा झाला आहे आणि त्यांची मागणी अशी आहे. रावबहादुर बोले सकाळपासून त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. तुम्हाला बोल्यांनी ताबडतोब बोलाविले आहे. चला. " असे त्याने म्हणताच मी तसाच तिकड़े धावलो. बोल्यांचे नि माझे थोडे बोलणे होताच, " अहो, मग इथं कशाला थांबलात ? सगळेच लोक उत्सवाचे मेंबर आहेत. तेव्हा चला सारे आपण प्रथम मंडप काबीज करू. आपलाच आहे तो." एकदम सगळा ५-६ शे तरुणांचा तो जमाव माझ्या नि बोले यांच्या पुढारीपणाखाली मंडपात घुसला. मी व्यासपीठावर चढलो आणि बोलू लागलो. इतक्यात डॉ. जावळ्यांच्या इषाऱ्याने तो गोरा सार्जण्ट नि काही पोलीस माझ्या अंगावर धावून "गेटाऊट यू ऑल. सब लोक चले जाव यहाँसे" तो डुरकू लागला. मी त्याला इंग्रेजीत धमकावले. " इथं तू कोण? का म्हणून आलास? आम्ही उत्सवाचे मेंबर आहोत. येथे जमण्याचा नि भाषणे करण्याचा आमचा अधिकार आहे. आधी तुम सब पोलीस आदमी यहांसे बाहर चले जाव. यू हॅव नो राइट टु एंटर हिअर. इथं काय दंगल मारामारी- रक्तपात झालाय, तर इथं धावून येता? चले जाव हे इथं ऑनररी मॅजिस्ट्रेट रावबहादुर बोलेसाहेब उभे आहेत." रावबहादुरांनीही सार्जण्टला कायदेबाज इषारा दिला. पार्टी मुकाट्याने बाहेर जाऊन बसली.
मला या प्रकरणाची काहीच माहिती नव्हती. पुण्याहून दादरला आल्यानंतर प्राप्त झालेल्या विपन्नावस्थेची कोडी सोडविण्यात मी गर्क होतो. १० च्या सुमाराला भास्कर कद्रेकर माझ्याकडे धापा टाकीत आला. "पुलावर लोकांचा भला मोठा जमाव गोळा झाला आहे आणि त्यांची मागणी अशी आहे. रावबहादुर बोले सकाळपासून त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. तुम्हाला बोल्यांनी ताबडतोब बोलाविले आहे. चला. " असे त्याने म्हणताच मी तसाच तिकड़े धावलो. बोल्यांचे नि माझे थोडे बोलणे होताच, " अहो, मग इथं कशाला थांबलात ? सगळेच लोक उत्सवाचे मेंबर आहेत. तेव्हा चला सारे आपण प्रथम मंडप काबीज करू. आपलाच आहे तो." एकदम सगळा ५-६ शे तरुणांचा तो जमाव माझ्या नि बोले यांच्या पुढारीपणाखाली मंडपात घुसला. मी व्यासपीठावर चढलो आणि बोलू लागलो. इतक्यात डॉ. जावळ्यांच्या इषाऱ्याने तो गोरा सार्जण्ट नि काही पोलीस माझ्या अंगावर धावून "गेटाऊट यू ऑल. सब लोक चले जाव यहाँसे" तो डुरकू लागला. मी त्याला इंग्रेजीत धमकावले. " इथं तू कोण? का म्हणून आलास? आम्ही उत्सवाचे मेंबर आहोत. येथे जमण्याचा नि भाषणे करण्याचा आमचा अधिकार आहे. आधी तुम सब पोलीस आदमी यहांसे बाहर चले जाव. यू हॅव नो राइट टु एंटर हिअर. इथं काय दंगल मारामारी- रक्तपात झालाय, तर इथं धावून येता? चले जाव हे इथं ऑनररी मॅजिस्ट्रेट रावबहादुर बोलेसाहेब उभे आहेत." रावबहादुरांनीही सार्जण्टला कायदेबाज इषारा दिला. पार्टी मुकाट्याने बाहेर जाऊन बसली.
जावळे मंडळाचे लोक आजूबाजूला दूर खलबते करू लागले आमची भाषणे जोराजोरात चालू होती. १२ वाजले. गणपति पूजेची वाट पहात स्वस्थ बसला होता. कारण, तेथेही आमचे स्वयंसेवक पहारा देत होते." आज जर आमच्या अस्पृश्य हिंदू बांधवांना गणेश-पूजनाचा हक्क ३ वाजेपर्यंत देण्याचा शहाणपणा जावळे कमिटीने दाखविला नाही, तर मी स्वतः ही गणपतीची मूर्ती फोडून टाकीन " अशी मी गर्जना करताच डॉ.जावळे बोल्यांकडे धावत आले. आंबेडकरांना बोलावून आणा नि मग आपण सगळे एकत्र बसून हा मुकाबल्याचा गुंता आपण डॉ. सोडविण्याचा प्रयत्न करू असे गयावया करून सांगू लागले. लगेच डॉक्टरांकडे दोन तरुण रवाना झाले आणि सुमारे अर्ध्या तासात डॉ. आंबेडकर आले. आमच्याजवळ परिस्थितीची चौकशी केली. नंतर डॉक्टर, बोले, मी, इतर ५-६ जण शेजारच्या जावळ्यांच्या (हे जावळे निराळे. ते दादरचे कदीम घरवाले नागरिक होते.) घरी चर्चेसाठी डॉ. जावळ्यांबरोबर निघालो. अंगणात जाताच मी मोठ्याने ओरडून जावळ्यांना हाक दिली- अहो जावळे, सांभाळा भ्रष्टाचार, महार डॉ.आंबेडकर तुमच्या घरात येत आहेत त्यावर जावळे हसत हसत म्हणाले "अहो ठाकरे, माझ्या घरी हा भेदाभेद मुळीच नाही." स्वतः जावळे सामोरे आले आणि डॉ. आंबेडकरांचा हात धरून त्यांना ओटीवर घेऊन गेले. जावळे मंडळाचे प्रतिनिधी आणि आमच्यात सुमारे अर्धातास चर्चा चिकित्सा झाली. आणि अखेर ठरले की, आधी रिवाजाप्रमाणे ब्राह्मण पुजान्याने गणेशाची प्राणप्रतिष्ठापूर्वक शास्त्रोक्त पूजाअर्चा करावी. ती झाल्यावर कोणत्याही अस्पृशाने स्नान करून ओलेत्याने एक पुष्पगुच्छ स्वतः नेऊन त्या ब्राह्मण पुजाऱ्याच्या हातात शिवून द्यावा नि त्याने तो बिनतक्रारी शिवून घेऊन गणपतीला वहावा ! याप्रमाणे ठरताच अस्पृश्यांचा एक नामांकित कार्यकर्ता मडकेबुवा याला प्लाझा गार्डनच्या नळाखाली आंघोळ घातली आणि त्याने सर्वांसमक्ष लाल गुलाबाचा एक गुच्छ पुजाऱ्याच्या हाती दिला नि त्याने तो टाळ्यांच्या गजरात गणपतीला वाहिला. हा प्रकार ४ वाजता झाला आणि मंडळी घरोघर निघून गेली. पुढे अनंत चतुर्दशीपर्यंत मंडपातले कार्यक्रम सुरळीत पार पडले खरे, पण या आंदोलनाच्या दणक्याने उत्सवाचा नूरच फिका पडला. दरसाल हाच प्रकार "व्हायचा असेल तर या वार्षिक उत्सवाच्या फंदात पडण्यात तरी काय अर्थ? असा जोरदार विचार-प्रवाह जीर्णमतवादी ब्राह्मण मंडळीत चालू झाला. झालेल्या तडजोडीला प्रसंगाची निकड जाणून जरी त्यांनी तटस्थपणा पत्करला होता, तरी मनातून ते जळफळतच राहिले. गणपती बाटला म्हणून कित्येक मंत्रजागरवाल्या भिक्षुकांनी ऐन वेळी निमंत्रणाला नकार दिला. तेव्हा दुसरा कसला तरी कार्यक्रम ठेवून वेळ मारण्यात आली. आजवर या उत्सवाला सगळा जाती जमातीकडून वर्गण्या मिळत गेल्या. पण यापुढे त्या कोणी देऊ नयेत, असा प्रचार झाला तर? अखेरच्या रात्री डॉ. जावळे यांनी भर सभेत पुकारा केला की "यंदाच्या झालेल्या प्रकारावरून हा उत्सव पुढे चालू ठेवणे सर्वतोपरी अशक्य आहे. निदान मी तरी या फंदात मुळीच पडणार नाही. दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव यापुढे कायमचा बंद
आणि खरोखरच दादरचा सार्वजनिक गणेशोत्सव जवळ जवळ ३० वर्षे कायमचा बंद पडला. अगदी अलिकडे दादरच्या समर्थ व्यायाम मंदिराच्या गणेशोत्सवाला ‘सार्वजनिक’ विशेषण लावून तो पुन्हा चालू झालेला आहे.
ही उणीव भरून काढलीच पाहिजे
कारणे काहीही असोत, पण दादरसारख्या उदयोन्मुख भागातील गणेशोत्सवासारखा एक महोत्सव बंद पडणे ही घटना मला किंवा कोणालाही फारशी पसंत पडली नाही. त्यातच इतर सगळे राहिले बाजूला आणि ठाकऱ्यांनी गणेशोत्सव बंद पाडला हा सगळीकडे गवगवा चालू झाला. असल्या आक्षेप विक्षेप नि आरोपांच्या राळफेकीचा माझ्यावर कधीच काही परिणाम होत नसतो. उलट, त्याशिवाय काही दिवस मोकळे गेले तर मात्र ओकेओके वाटते. कारण,कोणत्याही आंदोलनातील माझ्या आचार-विचाराची भूमिका प्रथम पायाशुद्ध ठरवूनच त्यात मी उडी घेत असतो. अर्थात् पश्चात्तापाची किंवा निराशेची नि माझी गाठभेटच होत नाही. आजवर अनेकांनी माझ्यावर काय थोडेथोडके बरे वाईट आणि घाणेरडेही आरोप केले? पण केव्हाही डगमगण्याचे मला काही कारणच नव्हते. ज्याची लंगोटी स्वच्छ, तो कुणाला भिणार नि कुणाची पर्वा करणार? ही बेडर नि बेपर्वा वृत्ती माझ्या स्वभावात भिनलेली नसती, तर नातेवाईकानी काय, जातवाल्यांनी काय किंवा आणखी कुणी शेंदाडाने काय, माझ्या टाळक्यावर टाकळे रुजवले असते. असो. बहुजन समाजाला असा आकर्षक महोत्सव हवा होता की ज्यात आब्राह्मण शूद्रादी अस्पृश्यांनाही आपुलकीने नि मोकळ्या मनाने सहज भाग घेता यावा. याचा विचार करण्यासाठी रा. ब. बोल्यांचा बंगल्यावर ताबडतोब मी काही स्नेही मंडळींची बैठक बोलावली. महाराष्ट्राची मुख्य देवता श्री मायभवानी. तिच्या दरबारात सगळ्यांना मुक्तदार, तिचा नवरात्र महोत्सव हाच वास्तविक महाराष्ट्राचा राष्ट्रीय महोत्सव. प्राचीन काळचा इतिहास सोडा, छत्रपती श्रीशिवरायापासून हा नवरात्रोत्सव संबंध महाराष्ट्रात घरोघरी आणि गडोगडी थाटामाटाने साजरा होत असे. पेशवाईच्या नि त्यांच्या गणेश दैवताच्या स्तोमामुळे तो उत्सव माजी पडला. लो. टिळकांनी त्याला सार्वजनिक स्वरूप देऊन त्या स्तोमाचे पुनरुज्जीवनच केले. आपण यापुढे नवरात्र महोत्सव साजरा करण्याचा परिपाठ चालू करून, बहुजन समाजाला एकत्र आणण्याचा म्हणजे जुन्या ऐतिहासिक परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचा आत्ताच. यंदाच (सन १९२६) प्रयत्न करावा. ही सूचना सर्वमान्य होऊन त्यासाठी `लोकहितवादी संघ’ स्थापन केला आणि सन १९२६ च्या पूर्वी मुंबईत किंवा महाराष्ट्रात कोठेही प्रघात नसलेला श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव साजरा करण्याचा पहिला मान दादरने मिळविला.
श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव
सार्वजनिक नवरात्र महोत्सव आणि तोही कसा? अस्पृश्यांसगट अखिल हिंदू जनाना बंधुभावाने समाविष्ट होऊन सहभाग घेता येईल असा, दादरच्या लोकहितवादी संघाची ही कल्पनाच इतकी आकर्षक ठरली की कुलाबा ते कल्याण आणि पालघरपर्यंतची मऱ्हाठी जनता त्याच्या सांगतेसाठी एकजूट एकमूठ संघाच्या सहकाराला धावली. ठळक रकमांच्या देणग्या भराभर गोळा होऊ लागल्या. शिवाय नाना प्रकारच्या साहित्य सामुग्रीच्या आश्वासनांची अनेकांकडून खैरात झाली. काळ्या मैदानावर ८० फूट लांब नि ६० फूट रुंद विशाल मंडप थाटला गेला. सन १९२६ साली बीबी रेल्वे आणि टिळक पूल यांच्या दरम्यान एक फक्त धुरू हॉलची इमारत होती. बाकी सगळा विभाग मोकळा. पूर्वी तेथे एक तलाव होता. तेथे भाजीवाल्या बाया सकाळी भाज्या धूत असत. मुन्सिपाल्टीने जळलेल्या दगडी कोळशाचा कोक आणून तो तलाव बुजवून टाकला होता. म्हणून त्याला काळे मैदान नाव पडले. त्या विस्तीर्ण मैदानाचा सार्वजनिक जाहीर सभांसाठी दादरकरांनी ३-४ वर्षे तरी खूप उपयोग केला. पहिली उडी मारली नवरात्र उत्सवाने त्यानंतर अमेरिकेतल्या अर्कप्राशन प्रतिबंधक जागतिक प्रचार करणाऱ्या ‘एकाक्ष’ पसिफूट जॉनसनचे व्याख्यान आणि दांडीमार्चच्या योगावरच लाला लजपतराय यांच्या निधनाविषयीच्या सभेत सरोजिनी नायडू यांचे भाषण माझ्या अध्यक्षतेखाली झाले होते.
मंडपातला ३०` x १०` भाग भवानी मातेची मूर्ती आणि घटस्थापनादी धार्मिक व्यवस्थेसाठी निराळा आखून घेतला आणि बाकीचा ३०` x १०` कार्यक्रमांच्या व्यासपीठासाठी राखून ठेवला. आश्विन शुद्ध प्रतिपदेपूर्वी तब्बल आठवडाभर शेकडो स्पृश्यास्पृश्य तरुणांची मांदी माझ्या हुकमतीखाली रात्रंदिवस श्रमत झगडत होती. ‘अमुक पाहिजे’ एवढा शब्द निघण्याची थातड, ती वस्तू पुरवायला लोक आजूबाजूला उभेच. घटस्थापनेचा विभाग शृंगारण्यासाठी मुंबईचे प्रख्यात तांब्या-पितळेच्या भांड्यांचे व्यापारी कै. बाबाजी अनाजी तारकर यांनी तर आपला एक प्रतिनिधीच मंडपात उभा ठेवला होता. घट पाहिजे. केला फोन. तासभराच्या आत पितळेचा मोठा पाट आणि तांब्याचा २ फूट व्यासाचा एक घट झाला मुंबईहून रवाना. शिवरायाचा भगवा झेंडा? ६ फूट लांब नि ५ फूट रुंदीचा रेशमी भगवा हजर. आता याला पोल पाहिजे. गेला तारकरांकडे फोन आला दीड इंच व्यासाचा ५० फूट उंचीचा क्रोमियन प्लेटेड स्तंभ, वरची कड़ी नि मॅनिला पांढऱ्या दोरासह एक तासात हजर. घटाकडचा विभाग रंगीबेरंगी पडद्यांनी शृंगारला गेला. पण तेथेही काहीतरी विशेष आकर्षण असल्याशिवाय जमणार नाही. काय करावे? कल्पना सुचली. अरे भवानी मातेची ७ फूट उंचीची सुंदर रंगविलेली तसबीर किंवा मूर्ती कुठे मिळेल का? एक सिनेमा कंपनीने रविवर्म्याच्या काली देवीच्या तांडवनृत्याचा एक मोठा कटौट फ्लॅट तयार केलेला आहे. मिळेल का तो? कां नाही? आता घेऊन येतो. गेले चार-पाचजण तिकडे आणि आणला तो व्हिक्टोरियात घालून. केला उभा घटाच्या मागे, वाहवा ! प्रत्यक्ष कालीमाता भवानीच आली ऐन वेळेला धावून भक्तजनांच्या सहाय्याला. आता, नंदादीपाला दोन समया हव्यात, पण या नेहमीच्या छोट्या समयांचा या मूर्तीच्या प्रचंडपणापुढे काय पाड? तारकरांकडे फोन गेला. तासभरात आत राजेरजवाड्यांच्या दरबारात लागत असत, अशा पुरुषभर उंचीच्या दोन लखलखीत समया मंडपात हजर. काही मुली समयांसाठी कापसाच्या वाती वळत बसल्या होत्या. त्या समया पहाताच त्या एकमेकींकडे टकमक पाहू लागल्या! भी म्हणालो, "मुलींनो, कापसाच्या या चिंगुल्या वाती काय पुरणार? समयांच्या प्रत्येक थाळीत शेरभर तेल लागेल. वातीसाठी पांढऱ्याशुभ्र मॅनिला रोपचे बंडल हवे हवे म्हणताच येऊन दाखल झाले. मुगभाटातल्या वाजंत्री कुटुंबांनी दररोज सकाळ-संध्याकाळ सनई चौघाड्याच्या पाळ्या पत्करल्या. उत्सवाच्या या साऱ्या सोयी होत असताना ठिकठिकाणच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी मैदानावर जमायच्या. प्रतिपदेच्या आदल्या दिवसापासून भवानी मातेच्या नंदादीपासाठी दादर, परळ, गिरगाव विभागांतून अनेक मुली नि महिला तेलाची भांडी घेऊन येऊ लागल्या. आता हे तेल साठवायचे कसे नि कुठे? झालं. केला तारकरांना फोन आणि आला तोटी लावलेला एक मोठा चौकोनी तांब्याचा हौद, त्याचा लाकडी स्टैंड आणि सोबत एक पितळेचे हँडल लावलेले भांडे, अगदी हे लिहीत असतानाही गहिवरुन सांगतो की ‘अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने’ या संतोक्तीचा प्रत्यक्ष अनुभव मला या उत्सव प्रसंगी पदोपदी आला.
उजाडला. आश्विन शुद्ध प्रतिपदेचा दिवस उजाडला. सनई चौघडा वाजू लागला. आबालवृद्ध स्त्रीपुरुष मुलामुलींची अगदी गर्दी जमू लागली. लोकहितवादी संघाचे सगळे पुढारी हजर झाले. रा. ब. बोले अध्यक्ष नात्याने सगळ्यांचे आगतस्वागत करू लागले. उदबत्त्यांचा घमघमाट सर्वत्र दरवळू लागला. प्रथम श्री शिवरायाचा भगवा झेंडा उभारण्याचा मान त्यावेळचे महार आमदार सोळंकी यांना दिला. टाळ्यांच्या नि चौघड्याच्या कडकडाटात भगवा ध्वज उंच जाऊन फडफडू लागला. इतका उंच का तो एल्फिन्स्टन रोडच्या पुलावरून सहज दिसत असे. नंतर घटस्थापना, हा धार्मिक विधी महार दांपत्याकडून करविला. पूजाविधी दादरचे विख्यात महाशय पालयेशास्त्री यांनी यथाविधी यथाशास्त्र मंत्रोच्चारांनी साजरा केला. नंतर आरती, प्रबोधनाचे नामवंत कविवर्य वसंत बिहार ऊर्फ जोशी यांनी जगदंबेची आरती रचली होती. तिच्या छापील प्रती वाटण्यात आल्या. आबालवृद्धांनी एकसुरात आरतीचे गायन केले. आरतीला रा. ब. बोले उभे होते. आरती संपल्यावर घरोघरचे शेवंतीचे प्रचंड हार जगदंबेच्या मूर्तीला पडू लागले. दादरमध्ये एक अगदी नव्या थाटामाटाचा महोत्सव गरजू लागला. सबंध दिवसभर दर्शनासाठी लोकांची प्रामुख्याने महिलांची वर्दळ अखंड चालू झाली. मुंबईची महालक्ष्मीच दादरला अवतरली म्हणाना दररोज लोकांचा उत्साह दुथडीवसा काय शतथडी वाहू लागला. स्पृश्यास्पृश्य भेद कोणाच्या खिजगणतीतही उरला नाही. एकजात मऱ्हाठी माणूस एका जगदंबेचे कन्यापुत्र नात्याने सरमिसळ वावरू लागला. एकमेका भेटू लागला. जगदंबेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तजनांनी दोन्ही रेल्वेच्या गाड्या भरगच्च भरून येऊ लागल्या. देवीसमोर ठेवलेल्या पेटीत देणग्यांच्या राशी पडू लागल्या.
दार ऊघड, बये दार ऊघड
दादरच्या सुप्रसिद्ध दशहरा भजन मंडळींचे प्रवर्तक कै. पंचम बुवा यांच्या फडाचे भजन ९ रात्री रोज ठरलेले. या पंचम बुवांची ललकारी व्हायची ती थेट पंचमात आणि त्यांच्या हातचा मृदंगही लागलेला असायचा पंचमात म्हणून त्यांना दादरकर लोक पंचम बुवा याच नावाने ओळखत असत. पंचमीच्या रात्री पंचम बुवांनी एक अद्भुत नवलाचा साक्षात्कार श्रोत्यांना घडविला. अकरा साडे अकराच्या सुमाराला त्यांनी एकाएकी पंचमात आरोळी ठोकून ‘दार उघड बये बये दार उघड` या अस्सल मऱ्हाठ्यांच्या राष्ट्रीय गीताला प्रारंभ केला आणि त्यांच्या फडकर मंडळींनी तो असा काही अवसानात रंगविला का अर्धापाऊण तास आम्ही शेदीडशे श्रोते देहभान विसरून, प्रत्यक्ष श्री शिवरायाच्या मायभवानीपुढे एकतान दार उघडण्याची त्या बयेला आळवणी करीत आहोत, अशा वातावरणात अगदी न्हाऊन निघालो. त्या भजनाचा तसा रंग पुन्हा अनुभवायला मिळाला नाही.
पोवाड्यांच्या शाहिरी कार्यक्रमासाठी, रस्त्यावर उमाजी नायकाचा पोवाडा गाणारे ५-६ जण बोलावले. नाटकी कपड्यांच्या दुकानातून पायघोळ चुणीदार अंगरखे, कंणगीदार पगडा वगैरे सामानाने त्यांना सजवले आणि सोडले व्यासपीठावर. इतके उत्तेजन मिळाल्यावर त्यांनी पोवाड्यांचा कार्यक्रम असा भरदार रंगवला का रात्री १२ वाजेपर्यंत कोणी जागचा हलला नाही. अनेक वक्ते, कवी, प्रवचनकार यांचेही भरघोस कार्यक्रम दर रात्री होत होते. रात्री १० नंतर भजन मंडळ्यांचा कार्यक्रम व्हायचा. अष्टमीला तर त्यांच्या स्पर्धा ठेवल्या होत्या. तो कार्यक्रम सायंकाळी ६ पासून तो रात्री ११ वाजेपर्यंत झाला. श्रोत्यांची गर्दी तुडुंब. नवमीच्या रात्री दरसाल गिरगावातल्या महाराष्ट्र संगीत नाटक मंडळींच्या एखादा नाटकाचा प्रयोग व्हायचा.
दसऱ्याच्या स्वारीला पोलीस परवानगी देईनात. कारण काय ? तर म्हणे अशी मिरवणूक दादरला पूर्वी कधी निघालेली नव्हती. रा. ब. बोले, केळुसकर मास्तर, नवलकर वकील यांनी सरळ सांगितले की, " अहो, पुत्रच जन्माला आला नव्हता, तेव्हा बारश्याचा प्रश्नच नव्हता. पण यंदा तो जन्मलाय तेव्हा बारसे झालेच पाहिजे नि आम्ही ते करणारच करणार" परवानगी मिळाली. संबंध मुंबईतून लेजिमवाले, मलखांबवाले, भजनी फड, आपापले ताफे घेऊन हजर झाले. १२ वाजता जगदंबेची महापूजा नि सार्वजनिक आरती झाल्यावर शिलंगणाच्या स्वारीची तयारी चालू झाली. भवानीमातेचा तो फ्लॅट गाडीवर चढवून शृंगारला. सभोवार शस्त्रधारी मावळे उभे. मिरवणुकीच्या चौघड्याची गाडी नि बॅण्डचे पथक भवानीशंकर चौकात पोहचले तेव्हा देवीचा रथ चालू झाला. भ. शं. रोडवरील ब्राह्मण मंदिराच्या गल्लीतून चर्चकडे, तेथून (नुकताच तयार झालेल्या) गोखले रोडवरून, कोहीनूर मिलच्या नाक्यावर, तेथून सरळ टिळक पुलावरून हिंदू कॉलनीतील किंग जॉर्ज ई. स्कूलसमोरच्या वर्तुळाकार मैदानात, हा मिरवणुकीचा मार्ग, असली विराट मिरवणूक दादरमध्ये पूर्वी कधीच निघालेली नव्हती. तेथे रा. ब. बोल्यांच्या हस्ते सुवर्णपूजन झाले. सोने लुटले गेले. डॉ. आंबेडकरांचे थोडेसे भाषण झाले, नंतर मिरवणूक- जशी होती तशीच परत वाजत गाजत टिळक पुलावरून वळसा घेऊन काळ्या मैदानावर आली. भवानाची मूर्ती स्थानापन्न केली. आरती झाली, आणि प्रसाद वाटला. प्रसादासाठी जोंधळ्याच्या लाह्या आणि पावली आकाराचे माळवी बत्तासे मिश्र करून मनमुराद वाटण्यात आले. स्वारी परत का आणली? जगदंबा सीमोल्लंघन करून मुलुखगिरी गाजवते आणि लुटलेले सोने घेऊन स्वराज्यात येते, तेथे तिचा यथोचित सत्कार होतो नि मगच श्री शिवभवानी नवरात्र महोत्सवाची पूर्णता होते. उत्सवमूर्तीला समुद्रात कळसविण्याचा प्रघात बंगल्यात आहे. आम्हा मऱ्हाठ्यांचा नव्हे.
हा उत्सव सन १९२९ पर्यंत मी चालविला. पुढे आजारपणामुळे मी दादरहून कर्जतला गेलो. तेव्हापासून मात्र हा उत्सव खांडके चाळींतील मंडळी नियमित सालोसाल साजरा करीत असतात. १९२६ चा उत्सव झाल्यानंतर मात्र या उत्सवाचे लोण मुंबई महाराष्ट्रभर सारखे फोफावत गेले.
जवळकराची विलायत यात्रा
दादरला येऊन झाले असतील तीनचार महिने तोच कानावर बातमी आली का जवळकर म्हणे विलायतेला गेला! अरेच्या, ही अशक्य घटना झाली कशी शक्य? फाटक्या खिशाचा हा सर्वश्रुत इनामदार, काही हजार बिजार नव्हे तर म्हणे चक्क एक लाख रुपये नोटांचे पुडके पाटलोणीत कोंबून लंडनला गेला! त्याच्या प्राप्तीचे ओढे तर नेहमी सुकेठाक आढळायचे! पण लेकाचा गेला खरा. दोनअडीच महिन्यांनी परत येताच मात्र पहिल्या प्रथम मला येऊन भेटला. "लंडनला जाऊन आलो दादासाहेब, पंतप्रधान मॅकडोनल्डची भेट घेतली." तो म्हणाला. मी विचारले- अरे, तुला तर एबीसीडीचा गंध नाही नि त्यांच्याशी तू बोललास तरी कसा? तो बोटीवरचे पंधरा दिवस मी सेल्फ इंग्लिश टीचरचा तोंडपाठ अभ्यास केला. बोटीवरच्या प्रवाश्यांशी इंग्रेजीत बोलण्याचे धाडस चालू ठेवले. लिवरपूलला उतरेपर्यंत गेले जमून सारे. आय कॅन टॉक इंग्लिश, तुमच्याइतके नाही, तरी लिट्टल लिट्टल्. बरं ते राहू द्या. मी आता मुंबईला आलोय. केनेडी पुलाच्या तोंडाशी एका बिल्डिंगमध्ये प्रशस्त जागा घेऊन तेथे छापखाना थाटला आहे. कैवारी साप्ताहिकाचे उद्यापासून प्रकाशन चालू होणार आहे. तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे..
त्याने माझ्या परिस्थितीची आपुलकीने चौकशी केली. तो - दादा, मला एक ग्रंथ तुम्ही लिहून द्या. शेतकरी जीवनावर नि त्याच्या भवितव्यावर. मी ठीक म्हटले, पण माझा उजवा हात अपघाताने लंजूर झाल्यामुळे लिहिण्याचे काम कसे काय जमणार? त्याने मोतीराम जांबावलीकराची लेखक म्हणून नेमणूक केली आणि लेखनाचे मानधन म्हणून मला तात्काळ ३०० रुपये रोख दिले. अंदाजे दोन महिन्यांत मी ‘शेतकऱ्यांचे स्वराज्य’ हे पुस्तक लिहिले नि त्याने ते छापून प्रसिद्धही केले.
जवळकर दोनतीन दिवसांआड नियमित येऊन मला भेटायचा. कायरे, विलायतचा प्रवास, हा छापखाना, कुठून फिरली एवढी यक्षिणीची कांडी?" तो ते आमचे शिक्रीट आहे. सांगेन केव्हा तरी, त्यावर शेतकऱ्याचे स्वराज्याचे लेखन चालले असताना, एकदा तो मला आवर्जून म्हणाला हे पहा दादासाहेब, या पुस्तकात वाटेल त्यावर हवी तशी टीका करा. पण आमच्या म्हाताऱ्याला भास्करराव जाधवांना मात्र दुखवू नका. मी कां पण? आडकित्त्यात खांड आले का मी काडकन् तोडणारच. त्यावर तो अगदी गयावया करून म्हणाला - अहो, त्यांच्या प्रसादानेच मी विलायत गाठली नि छापखाना काढला. दारूपिठ्यांच्या लिलावांना लोकांचा चालला होता कडवा विरोध. जाधवराव अबकारी खात्याचे मिनिस्टर, मिनिस्टरने स्वतः वाटेल त्याला पिठ्याचे कंत्राट द्यावे, असा सरकारी हुकूम निघाल्याचे तुम्हाला माहीतच आहे. मी होतो लिलाववाल्यांचा वशिला लावणारा. त्या भानगडीत लक्षुबाईनं अस्मादिकांचा घेतला किस्स. हे आमचे शिक्रीट,
आषाढी एकादशीला कांग्रेजी तिरंगे
हा काळ जोरदार सरकार विरोधी कांग्रेजी आंदोलनाचा होता. जागोजाग सरकारी निमसरकारी इमारतीवर, शाळा-कॉलेजांवर तिरंगा झेंडा फडकविण्याचे सत्याग्रह होत होते. सायक्लोस्टाइलवर छापलेली गुप्त बुलेटिने भर रस्त्यावर विकली जात होती आणि विक्रेत्यांना पोलीस पकडायला आले का लोकांची दंगल चालू व्हायची. याच सुमाराला मिठाचा सत्याग्रहही जोरात होता. जमावाने जाऊन समुद्राचे पाणी आणले नि शिवाजी पार्कमध्ये सरोजिनी नायडूंनी स्टोवर ते तापवून त्याचे चिमूटभर मीठ केले. पोलीस नुसते पहात होते. याच सुमाराला आषाढी एकादशी आली. लोकांत कांग्रेसचा अभिमान एवढा प्रचंड भडकला होता का माटुंग्याच्या विठोबाच्या यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक भजनी मंडळीनी त्यावर्षी भगव्या निशाणाऐवजी कांग्रेजी झेंडे माटुंग्याला फडकावीत नेले. कांग्रेजी निशाणे विकणाऱ्या कांग्रेस कमिटीच्या दादर कचेरीने झेंड्यांचा चक्क काळाबाजार करून लाखावर कमाई केली.
माझ्यावर पुत्रशोकाचा आघात
परिस्थितीने अकस्मात फाटलेले जीवनाचे कांबळे रफू करून कसेबसे ठाकठीक करण्यात मी गुंतलो असता, अचानक माझा दुसरा (बाळच्या पाठीवरचा) अडीच वर्षांचा मुलगा, दिवाकर अवध्या ४-५ तासांच्या आजाराने गेला. प्रथम त्याला एकाकी ताप भरला. नंतर आकड्या येऊ लागल्या. त्यातच त्याचा अंत झाला. प्रसंग असा की सौभाग्यवती बाळंतीण नि त्या दिवशी श्रीकांत अवघ्या चार दिवसांचा. डॉक्टरांचा शोध घ्यायला धावलो तो ते सारे झेंडा सत्याग्रहाच्या गर्दीत बघे म्हणून घुसलेले. अखेर सायंकाळी डॉ. माधवराव प्रधान (त्यांचा दादरला दवाखाना होता) त्यांना आणले. पहातात तो काय? सर्व काही खलास. बाकीची हकिकत न सांगताही उमगण्यासारखी आहे. "मी आता येथे रहाणार नाही, असा सौ. ने हेका धरला. आणि तो साहजिक होता. सारे बिऱ्हाड कामाठ्याच्या चाळीत प्लाझा बागेसमोर एका मित्राच्या रिकाम्या जागेत आणले.
शाळा कॉलेजवर बहिष्कार टाका
याच सुमाराला ही एक चळवळ जोरात होती. मी स्वतः गांधीतत्त्वांचा कट्टा विरोधक, मला ही चळवळ मुळीच मान्य नव्हती. एक दिवस दादर इंग्लिश स्कूलच्या हॉलमध्ये या विषयावर नाटककार वरेरकरांचे भाषण होते, भी मुद्दाम गेलो. विरोधाला उठलो. "गांधी बोले नि जग डाले असा हा जमाना असला तरी विद्यार्थ्यांनी आपला शिक्षणक्रम सोडून राजकारणी चळवळीच्या हुल्लडीत पडावे, यात त्यांचाच अखेर नाश होणार आहे. शाळा-कॉलेज सोडा म्हणून सोटा आपटीत सांगायला वरेरकरांचे काय जाते? आहे कोण यांच्यामागे रडायला? हा निपुत्रिक खाड्यात गेली तर इतरांची पोरे जातील. हा नागण्णा काठावर सुखरूप" माझ्या भाषणाने खूपच खळबळ झाली. प्रिं. कोल्हटकरांनी माझ्या विधानांचा सडेतोड पुरस्कार केला. केळुस्कर मास्तर म्हणाले "चळवळीत येतात नि जातात, परिणाम लोकांना भोगावे लागतात. पुढारी नामानिराळे रहातात. कांग्रेसच्या झेंड्याखाली नाचणाऱ्या अनेक मोठमोठ्या पुढाऱ्यांची मुले आज लंडन अमेरिकेत शिकायला गेलेली, मला माहीत आहेत. शाळा-कॉलेजांवरील बहिष्कार म्हणजे तुम्हा आम्हा गोरगरिबांच्या अडाणी होणाऱ्या नव्या पिढीवर राज्य करणाऱ्या सुशिक्षित फॉरिन रिटर्ण्ड लोकांची एक नवी जात बसविण्याचे हे कारस्थान आहे. याला बळी पडतील त्यांचे भविष्य मला तरी फार भयंकर दिसते."
हिंदवी नीलकण्ठीझमची व्याख्याने
सन १९२७ च्या ठिकठिकाणच्या गणेशोत्सवात व्याख्यानांची अनेक निमंत्रणे यायची. त्यासाठी हिंदवी नीलकण्ठीझम् हा विषय मी घेतला. लोकांना त्याचे भलतेच आकर्षण चाटले नि प्रत्येक सभेला अलोट गर्दी होऊ लागली. भाषणाचा सारांश असा "हिंदुस्थान आणि प्रामुख्याने महाराष्ट्र हा शिवोपासक शैव आहे. सागर मंथनातून निघालेले हलाहल विष पहाताच देव दैत्यांची दाणादाण उडाली, पण शिवशंकराने ते असूरपणे प्राशन केले म्हणून नीलकण्ठ नाम प्रसिद्ध झाले. शंकराचा कण्ठ त्या विषप्राशनाने निळा झाला. शंकराने ही जी धडाडी दाखविली तिचे नाव नीलकण्ठीझम्. आजकाल हिंदुस्थानावर अनेक बाहेरच्या झमांचा झम्झमाट आक्रमण करू पहात आहे. पण हिंदुधर्म असा बहाद्दर आहे का त्याने आपल्या नीलकण्ठीझमने अनेक झम् आपल्या पचनी पाडून त्यांना हिंदुत्वाची दीक्षा दिलेली आहे. इस्लामी धर्मात मूर्तिपूजा नाही, पण येथल्या मुसलमानांना डोले नि पंजे पूजायला लावले कोणी? आमच्या नीलकण्ठीझमने, क्रिस्ती धर्मात म्हणे जातिभेद नाही. तसे म्हणायला कोणाच्या बापाचे काय जाते? पण येथल्या किरिस्तावांत लग्ने जुळविताना आजही "तो बामन क्रिश्चन नि हा कोळी क्रिश्चन" भेद पहातातच ना? आक्रमणाला समोर येईल त्या संस्कृतीतले चांगले घ्यायचे आणि चोथा भिरकावून द्यायचा, हा नीलकण्ठीझमचा धर्म आहे.. हिंदुस्थानावर अनेक परधर्माची परचक्रे आली. त्या सगळ्यांना पचनी पाडून हिंदू धर्म आणि संस्कृती आजही आपापल्या पायांवर ताठ उभी आहे. यातले मर्म शोधणारांना ते हिंदवी नीलकण्ठीझममध्येच सापडेल. इतरत्र नाही.
मोतनखातर डुब्बी मारी, शंख लगे हात
हजार उलाढाल्या नि साळ्याची गाय नि माळ्याचे वासरू करून, उदरनिर्वाहाचे आणि विचार-प्रचाराचे एक जबरदस्त साधन म्हणून मी छापखाना चालू केला. पुण्यासारख्या कट्टर विरोधकांच्या बालेकिल्ल्यात तो चालू केला, ही माझी पहिली चूक. पण परिस्थितीच्या लाटेसरसा फक्त वहावत जाणे एवढेच मला त्यावेळी शक्य होते. अखेर पुण्याच्या तापलेल्या वातावरणातून निसटून, नवा काही मार्ग शोधण्यासाठी मी दादरला परत आलो नि छापखाना पुण्यास बंद करून ठेवला. कारण अखेर मला त्यावरच पुढचा जीवनाचा पल्ला गाठावयाचा होता.
दादरला एक स्नेही भेटले. (नाव सांगण्यात अर्थ नाही. आता तो दिवंगत आहे.) हे गृहस्थ बरीच वर्षे सरकारी अधिकारावर होते. तेथे मनस्वी `खादी कर्म` केल्यामुळे अखेर डिसमिस झाले. काही उद्योग करावा म्हणून त्यांनी "मला छापखाना चालवायला देता काय?" असा सवाल टाकला. दरमहा ६० रुपये भाडे ठरले. त्याने पुण्याहून तो आणला नि दादरला चालू केला. मी तो ठाकठीक लावून दिला.
दरमहा निदान ६० रुपये चूल पेटवायला हाती लागले. ठीक होते. पण ग्रहयोग म्हणा परिस्थितीचा चक्रव्यूह म्हणा. तो मला थोडाच पुढे पाऊल टाकू देणार? एकाकी मला डिस्पेपसियाचा आजार जडला. पुत्रशोकाच्या वेदना तर ताज्याच होत्या. डॉक्टरांनीच त्या रोगाचे बारशाचे नाव तसे ठेवल्यामुळे मला ते मान्य करावे लागले. कोणत्याही आचाराला डागदारांनी जाडजूड लॅटिन नाव सांगितले का तोच रुग्णाच्या छातीत पहिला धसका देतो, त्यातच आणखी वर “ताबडतोब ड्राय क्लायमेटवर जा. केस सीरिअस आहे" असा लाल सिग्नल दाखवला का बिचाऱ्याला तिथेच सोनापूर दिसायला लागते. ड्राय क्लायमेटच्या जागा म्हणजे पंचगणी महाबळेश्वर, वाहवा ! धनाशेटीच पडलो ना मी! आधीच खिसा फाटका, त्यात डाक्टराने दिला हा झटका. खूप डोके खाजवले नि अखेर कर्जत येथे बिऱ्हाड हालविण्याचे ठरविले. म्हटले, दरमहा छापखान्याचे भाडे नियमित येत जाईल, त्यावर कर्जतसारख्या खेडेगावात चालेल संसार ठाकठीक. प्रकृतीलाही आराम पडेल.
अखेर दोस्तांनीच गळा कापला
सुरुवातीला दोनतीन महिने भाड्याचे पैसे चेकने नियमित आले. पुढे त्या गृहस्थाची बुद्धी फिरली. छापखाना त्याच्या हातात. सर्व व्यवहार तोंडातोंडी त्याने चेक पाठवावे आणि बँकेने “खडखडाट” शेऱ्याने ते मला परत करावे, असा क्रम चालू झाला. दादरला जाऊन भेटलो.. तर तो माझी मालकीच कबूल करीना, छापखाना पडला जंगम माल. ज्याच्या हाती ससा तो पारधी अखेर आणखी एक दुसरे विश्वासाचे हो, अगदी विश्वासाचे दोस्त मध्यस्थ घालून, छापखाना विकून टाकण्याचा मी विचार केला. त्याने काय केले? " विक्रीची रक्कम येईल ती तुझ्याजवळ ठेव आणि मला दरमहा शंभर रुपये पाठवीत जा." असे मी ठरविले.
त्यानेही फक्त एकच महिना ५० रुपये तारेने पाठविले नि बसला गप्प! पुन्हा धावलो दादरला. चौकशी करता म्हणतो छापखाना ९०० रुपयाला विकला. अरे, १२ हजारांचा प्रेस ९०० ला कसा विकलास? उत्तर नाही. मग कानावर आले का वरून सोवळा धुपट गोडबोल्या दिसत असला तरी तो असामी होता सट्टेबाज नि व्यसनी. त्याने विक्रीची आलेली हजार बाजारी रक्कम सट्टे जुगारीवर गडप केली. हयातीत भोगलेल्या शेकडो हालअपेष्टा नि आपत्तींचे तडाखे मी विसरु शकतो, पण त्या दोन दोस्तब्रुवांनी माझा केलेला विश्वासघात मी कधीही विसरू शकणार नाही.
कर्जतचे सुखदुःख मिश्रित जीवन
येथे मात्र मला खेडेवजा तालुक्याचे लोकजीवन अनेक दृष्टिकोनांतून अभ्यासता आले. मुंबईसारख्या बकाल शहरी जीवनापेक्षा येथील लोकांचे जीवन वरपांगी साधेभोळे गयावळ दिसले, तरी त्यांच्या अंतरीच्या नाना कळा सहजासहजी उमगण्यात येत नाहीत. कर्जतला मारवाडी व्यापाऱ्यांची पिढ्यान् पिढ्यांची वसाहत आहे. अर्थात तेथे सावकारीचे सगळे तेढेबाके खेळ जबरदस्त चाललेले. स्थाईक सुखवस्तु ब्राह्मण सावकारही आहेतच. पंचक्रोशीतला खेडवळ शेतकरी वर्ग बहुतेक सावकारी फासात अडकलेला. तेथले सारे समाजकारण, राजकारण सावकारशाहीच्या हाती. वकिलांच्या वकिली काव्याला येथे भरपूर वाव. लाभासाठी कुणाला कसा हरबऱ्याच्या झाडावर उंच चढवावा नि अचानक कचाट्यात पकडून खाड्यात कसा गाडावा, या कामात तालुक्यातले लोक फार हुशार. उगाच का कोर्ट कचेऱ्यांची कामे आणि रजिस्ट्रारची स्टांपविक्री एवढी जोरात चालते? जो पहावा तो ‘तारखांच्या’ शर्यतीत गुंतलेला. उद्योग थोडा नि रिकामा वेळ भरपूर, तशात माझ्यासारखा परगावचा कोणी वसाहतीला आला का त्याच्या हालचालीवर स्थानिकांची विशेषतः कुलंगड्यांचा धंदा करणाऱ्यांची सक्त नजर. कलिंगडांच्या पिकापेक्षा असल्या खेडेवजा तालुक्यांच्या ठिकाणी कुलंगड्यांची पैदास फार मोठी. कर्जत त्याला अपवाद नाही. शहरात जो तो आपल्या पायांकडे पहात कोणाच्या अध्यात ना मध्यात वृत्तीने भुलाबुरा व्यवहार संसार चालवीत असतो. तालुक्यात नि पट्यात सरळ चालणाराच्या पायात पाय अडकवून त्याला पाडावा कसा, यावर कुलंगडीखोरांची खटपट सारखी घालू असते.
तब्बल १५-२० वर्षे निर्मळ स्नेहधर्माने माझ्याशी वागलेला, पण अखेर तो आपल्या कर्मजात कुलंगडेपणाच्या आहारी जाऊन, माझे कर्जतचे जीवन विखारी करणारा एक दोस्तही मला येथे भोवला. अखेर आपल्या शेकडो बदकर्मानीच सहपरिवार तो रसातळाला गेलेला असल्यामुळे, त्याच्या अघोरी कहाणीने मी आपली लेखणी विटाळीत नाही.
कर्जतला अंदाजे वर्षभर रहाणे मला भाग पडले. तेवढ्या मुदतीत सभोवार कारस्थान्यांचा, कटबाजांचा, निष्कारण मत्सर करणारांचा केवढाही वेढा पडला, तरी तेथेही माझ्या जिवाला जीव देणारे, अडीअडचणीची कोडी सोडविणारे आणि कोंडी फोडणारे, हाक मारताच धावून येणारे कितीतरी ब्राह्मण ब्राह्मणेतर तरुण स्नेही मला येथे लाभले. हरीभाऊ जोशी, भिकू परांजपे, वैद्य (ध्रुवबाळ), बाळ आरेकर, महाले पतिपत्नी, करंदीकर, वडखळकर, गिरणीवाले वैद्य बंधू आणि अनेक. कितीकांच्या मूर्ती नजरेसमोर तरळतात, पण नावे आठवेनाशी झाली आहेत. "ठाकरे ब्राह्मणद्वेष्टे" हा आरोप आजही कोणी कर्जतला करून पहावा. त्याची तरुण ब्राह्मण मंडळींकडूनच चांगली संभावना झाल्याशिवाय रहाणार नाही. या सर्व मंडळींचा जिव्हाळ्याचा स्नेहसंबंध या क्षणापर्यंत अखंड टिकलेला आहे. आजही ते वरचेवर मला येथे येऊन भेटून जातात. मात्र कर्जतच्या जातवाल्यांनी मला कसलीही मदत केली नाही किंवा कोरडी सहानुभूतीही दाखविली नाही.
नाटके लिहिण्याचा उद्योग
"त्याच स्नेही मंडळींच्या उत्तेजनाने आणि सक्रीय पाठिंब्याने कर्जतला मी नाटके लिहिण्याचा उद्योग हाती घेतला. छापखाना हातचा गेला. प्रबोधन बंद पडले. निर्वाहाची साधनेच उरली नाहीत. तशात कुलंगडेबाज खेड्यातली वस्ती. सभोवार गडद अंधार असतानाही उजेडाची किंचितशी चीर जरी मला दिसली, तरी त्या दिशेने धडाडीने पाऊल टाकण्याचा माझा स्वभाव आहे. पूर्वाश्रमात अनेक नाटक मंडळ्यांबरोबर महाराष्ट्रभर मी फिरलोच होतो. नाट्य माझ्या रक्तात भरपूर खेळत होते. केली नाटके लिहायला सुरुवात. (१) ध्रुवाचे अढळपद, (२) कर्णचरित्रावरील ‘टाकलेलं पोर’ आणि (३) काळाचा काळ, ही तीन नाटके मी लिहिली. स्नेही मंडळींनी ध्रुवाचे अढळपद वठवायला घेतले आणि बिहार फंडासाठी त्याचा एक प्रयोगही कर्जतला केला.
त्याच सुमाराला कर्जतला महाराष्ट्र नाटक मंडळी आली होती. नाट्यक्षेत्रातले सगळे जुने ऋणानुबंध उजळले गेले. त्यांचे `पहिला पांडव’ नाटक पाहिले. त्यात काळकर्ते अण्णासाहेब परांजपे यांनी चितारलेली कर्णाची चरित्ररेखा मला मुळीच आवडली नाही. म्हणून मी ‘टाकलेलं पोर` या नाटिकेचे २ अंक लिहून काढले. केशवराव दात्यांना ते वाचून दाखविले. त्यांना ते पसंत पडले. त्यावेळी ते म्हणाले- "हे पहा केशवराव या नाटकात एक महत्त्वाचा सामाजिक प्रश्न तुम्ही चांगलाच हाताळला आहे. पण आज जर कोणता अत्यंत महत्त्वाचा विषय हाताळायचा असेल तर तो अस्पृश्यता- विध्वंसनाचा आणि तो परिणामकारक वठवाल तर तो तुम्हीच. कारण त्या क्षेत्रांतला तुमचा अनुभव आणि खटपटी प्रत्यक्ष (डिरेक्ट) आहेत. या विषयावर एक छान नाटक लिहा बुवा." सूचना मी मान्य केली नि त्या दिशेने विचारचक्राला गति दिली.
पुन्हा पुण्याला प्रस्थान ठेवले
तयार नाटकांना पुण्यासारखी बाजारपेठ नाही, या विचाराने मी कुटुंब कबिल्याला वऱ्हाडात माहेरी पाठवून, आमची सडेसोट स्वारी कर्जतला रामराम ठोकून पुण्याला आली, येथे एक दिवस अचानक जयरामभाऊ देसाई यांची गाठ पडली. त्यांनी नुकताच जय भवानी नाटक मंडळीचा संसार जिजामाता बागेनजीकच्या नातूंच्या इमारतीत थाटला होता. त्यांनी ‘ध्रुवाचे अढळपद’ नाटक घेण्याचे ठरविले. तालमीही चालू झाल्या. तेथे गोखले नावाचे एक वयातीत गृहस्थ भेटले. नाटकाच्या तालमी देण्यात ते फार अनुभवी होते. त्यांनी अढळपदाच्या तालमीचे काम अंगावर घेतले. कंपनीत २ नट्या आणि बाकी २५-३० नट होते. सतत ३ महिने तालमी झाल्यावर, आता नाटक लवकर लावा, असा भेटीला येणाऱ्या अनेक हितकर्त्या स्नेही मंडळींचा आग्रह होऊ लागला.
त्या कंपनीत काका नावाचे एक काळगले लुकडे म्हातारेबुवा एक बाजूला स्वतंत्र खोलीत असायचे. त्यांच्याकडे रोज सांजसकाळ १५-२० खादीधारी तरुण यायचे नि कसलासा पास घेऊन जायचे. एक दिवस जयरामला ही काय भानगड? म्हणून विचारले. तर तो म्हणाला. आपल्या कंपनीचे काका तर मुख्य आधार आहेत. जे तरुण रोज येतात ते सारे काँग्रेस वर्कर्स आहेत. काकांच्या पासावर त्यांना दोन वेळ पुण्यातल्या कोणत्याही खानावळीत किंवा हॉटेलात पोटभर मोफत जेवण मिळते. खजिना येतो काँग्रेसकडून त्यातच आपली सगळी सोय लागत आहे आणि पुढे लागणार आहे." कसल्या आधारावर जयरामने जय भवानी नाटक मंडळीचा डोलारा उभा केला आहे. याची बरीच कल्पना मला आली.
नाटक छान वठले आहे तर बेंजामिनची कंपनी किलोस्करात आहे. त्यांच्या पडद्यावर सध्या सुरुवात करावी, म्हणजे स्वतंत्रपणे दामाजीपंत हातात खेळू लागतील, असा सल्ला अनेकांनी जयरामला दिला. पण काका म्हणे नको. आपण पडदे सीनसीनेरी स्वतः तयार केल्यावरच नाटक रंगभूमीवर आणायचे. झाले बुवा. पडद्यांच्या कापडांची थप्पी लागली. फलाटांसाठी लागणाऱ्या देवदारी फळयांच्या राशी येऊन पडल्या. पुण्यातल्या एका पेण्टरला पडदे रंगविण्याचे कंत्राट दिले. इकडे रोज सांजसकाळ ४० माणसांचा पुख्खा चाललाच होता. इतक्यात अचानक एका रात्री धरपकड चालू झाली. काही खादीधारी पकडले गेले. रातोरात काका फरारी झाले. जयरामला ब्रह्माण्ड आठवले. आणि काय? व्हायचे ते झाले. कंपनी बंद पडली. वडाचे झाड उन्मळून पडल्यावर, त्यावरचे पक्षी वाट फुटेल तिकडे गेले भुर्रकन उडून, काँग्रेसच्या भूमिगत चळवळीने जय भवानीचा बळी घेतला! अर्थात सगळ्यांच्या बरोबर आम्हीही हात हालवीत स्वस्थ बसलो. तसे म्हटले तर जयराम शाहूनगरवासीच्या गणपतरावचा चेला. नामांकित नट, त्याने स्वतंत्र नाटक मंडळीचा यापूर्वीही दोनतीनदा खटाटोप केला होता. पण व्यवहारशास्त्राची नि त्याची जन्मात कधी गाठभेट पडली नाही. माणूस दिलाचा दिल्दार, पण नेमका लुच्च्या दोस्तांच्या तडाक्यात सापडून फसायचा.
प्रकरण १९
खरा ब्राह्मण असा जन्मला
संत वाङमयाचा परिचय मला लहानपणापासूनच होता नि वयाबरोबर तो वाढतच गेला. आजही तुकारामाची गाथा, समर्थांचा दासबोध, ज्ञानेश्वरी यांचे वाचन मनन चालूच असते. त्यातल्या त्यात एकनाथांचे भारूड मला फार आवडते. त्यात नाट्य आहे. कवित्व आहे आणि नाथांच्या हृदयाची तळमळ उफाळून आलेली दिसते. अस्पृश्योद्धार विषयावर नाटक लिहिण्यासाठी साहित्य शोधीत असताना, साहजिकच संत एकनाथांचे चरित्र आणि चारित्र्य मला आकर्षक आढळले. त्याचा तपशीलवार अभ्यास सुरू केला. नाटकासाठी कथानकाची जुळणी चालली असतानाच, रेडिओ स्टार्स नाट्य संस्थेचे एक चालक कै. आळतेकर मला भेटायला आले. त्यावेळी स्टार्सची बेबी नाटिका अत्यंत लोकप्रिय झाली होती. भेटीत त्यांनी अस्पृश्योद्धारावर एक नाटक लिहिण्याचा आग्रह केला. तयार कथानकाचा खर्डा वाचून ते म्हणाले, "बस्स. पसंत आहे आपल्याला हे कथानक, आमची रेडिओ स्टार्स लवकरच येथे (पुण्यात) येणार आहे. तोवर नाटक लिहून पूर्ण करा. आम्ही ते घेऊ.”
ध्रुवाचे अढळपद नाटकाचा कडू अनुभव असताही, कोणी घेवो वा न घेवो, एकनाथ चरित्रावर नाटक लिहिण्याच्या माझ्या निर्धाराला प्रो. दिनकरराव समर्थ आणि कै. प्रिं. अण्णासाहेब खाड्ये यांनी आग्रहाचा पाठिंबा दिला. नव्या पेठेतील माझ्या बिऱ्हाडी ते दररोज येऊन, कथानकाच्या वठणी उठावणीच्या उपयुक्त सूचना देत असत. एक महिन्यात नाटकाचे तिन्ही अंक लिहून पुरे झाले. इतक्यात रेडिओ स्टार्सची छावणीही पुण्यास आली. नंदू खोटे नि आळतेकर यांनी नाटक पसंत केले आणि लगोलग एक दिवस कंपनीच्या बिऱ्हाडी सगळ्या नटनट्यांसमोर मुहूर्ताचा नारळ फोडून मजकडून नाटकाचे वाचन करविले. पात्रांची योजना ठरविली. स्टार्स मुंबईला गेल्यावर आळतेकरांच्या डायरेक्शनखाली तालमी चालू झाल्या. (एप्रिल १९३३) गुढी पाडव्याच्या दिवशी मी मुंबईला गेलो. रामनवमीच्या दिवशी मुंबईच्या बॉम्बे थेटरात पहिला प्रयोग निश्चित केला. नाटकात संगीत पद्यरचना व्हायची होती. मी येताच विख्यात संगीतज्ञ श्री. केशवराव भोळे यांनी चाली देण्याची बैठक घेतली. स्वतः केशवराव तबला वाजवून एकेक चीज गात होते. गुलाबराव व्हायलीनची साथ देत होते आणि मी चीजेबरहुकूम पदांची रचना करीत होतो. पद तयार झाले का केशवराव ते स्वतः गाऊन पास करीत होते. अशा रीतीने दोन तासांच्या त्या संगीत बैठकीत सगळ्या पदांची रचना तयार झाली आणि संबंधित पात्रांना त्यांची तालीम केशवराव देऊ लागले.
रामनवमीच्या आदल्या रात्री निवडक मंडळीसमोर नाटकाची रंगीत तालीम घेण्याचे ठरले. बॉम्बे थेटरात प्रकाशाचा झगझगाट उडाला. रंगीत तालीम हा ओळखी पाळखीच्या काही थोड्या निवडक मंडळींसमोर होणारा प्रयोग असल्यामुळे, थेटराचा प्रवेश दरवाजा बंद करण्यात आला होता. समोरच्या एल्फिन्स्टन थेटरात त्या रात्री हिराबाई बडोदेकर यांच्या कंपनीचे एक नाटक जाहीर झाले होते. पण त्या दिवशी हिराबाई अचानक आजारी पडल्यामुळे, खेळ बंद ठेवल्याची मोठी जाहिरातीची पाटी दरवाजावर लागलेली होती. प्रेक्षकांची तर थेटरवर गर्दी उसळलेली नि थेटर बंद ! समोरच्या बॉम्बेवर झगझगाट बाहेर खरा ब्राह्मण नाटकाचा भव्य फलक लागलेला. नंदू खोटे रंगीत तालमीच्या प्रयोगाला निमंत्रित केलेल्या स्नेही मंडळींची वाट पहात थेटराच्या अंगणात शतपावली घालीत होते. हिराबाईच्या नाटकाला आलेली मंडळी दरवाजापाशी येऊन नंदू महाशयांच्या विनवण्या करू लागली. "अरे आम्ही सहकुटुंब येथवर आलो आणि नाटक बंद फार निराशा झाली. आम्हाला सोडता का आत तुमच्या नाटकाची रंगीत तालीम पहायला? वाटेल तर पैसे घ्या, नंदू खोटे यांनी एकेक करता करता अंदाजे शंभरावर लोक आत घेतले नि आमच्या रंगीत तालमीच्या प्रयोगालाच सारे थेटर भरगच्च भरून गेले. प्रयोग अथपासून इतिपर्यंत रंगत गेला. वर्तमानपत्रातील जाहिरातीपेक्षा रंगीत तालमीच्या प्रयोगाला फुकट बसलेल्या लोकांनीच नाटकाची मुंबईभर परिणामकारक जाहिरात केली.
रामनवमीचा दिवस उजाडला. (दि. १२ एप्रिल सन १९३३, बुधवार) आणि अचानक बातमी आली का नौर्थब्रुक गार्डनजवळ हिंदुमुसलमानांचा दंगा झाला म्हणून, सकाळी १० च्या सुमाराला एक पोलीस इन्स्पेक्टर थेटरात आले नि म्हणाले का तुम्हाला दिलेले हापटबाराचे उखळीतल्या दारूचे लायसन रद्द करण्यात आले आहे. रामजन्माच्या देखाव्यात हापटबारांची जरूर होती तेवढ्यासाठी उखळीच्या दारूचे लायसन घेतलेले होते. दंग्याचा नि त्या चिमूटभर पिवळ्या दारूचा काय संबंध होता, पोलीस जाणे. हापटबार तर पाहिजेतच, मग आता कसे करायचे ? थेटरातले कामगार लोक पक्के इलमी. ते म्हणाले. अहो, हवी कशाला उखळी नि ती दारू. त्यांनी देवदाराच्या तीन इंच रुंदीच्या लवचिक लांब फळ्या काढल्या. एका टोकावर पाय देऊन दूसरे टोक उंच उचलून धरायचे आणि ते धाडकन तक्तपोशीवर सोडले का पहा केवढा आवाज होतो तो प्रयोग करून दाखवला नि तो रेडिओ स्टार्सने आपल्या सर्व प्रयोगांत पुढे कायम ठेवला.
नाटकात म्हणे बामणांची बदनामी
अशी एक कुरबूर सगळीकडे कुणीतरी फैलावली. नाटकाचे प्रयोग बंद करावे अशा सूचनांचे तक्रार अर्ज पोलीस कमिशनरकडे गेल्याचे पोलिसांकडूनच आम्हांला कळले. प्रयोग पास करणारे मुख्याधिकारी मोहनलाल स्वतः काही चोखंदळ अधिकाऱ्यांसह एका प्रयोगाला मुद्दाम येऊन बसले. प्रयोग संपताच बाहेर येऊन त्यांनी माझे मनसोक्त अभिनंदन केले. "या नाटकात ज्यांना बामण-निंदा दिसते, ते एक तर लफंगे असावे किंवा आंधळे तरी असावे. अस्पृश्योद्धारावर इतके परिणामकारक आणि तेही एका संताच्या चरित्रावर लिहिलेले नाटक आम्ही तरी हे प्रथमच पहात आहोत. खुशाल चालवा तुमचे प्रयोग." असा त्यांनी सगळ्यांनी आपला एकमुखी अभिप्राय दिला दररोज सायंकाळी ६ वाजता नि रात्री १० वाजता असे दोनदोन प्रयोग आणि रविवारी दुपारी ३ वाजता. नंतर ६ नि १० वाजता असे तीन प्रयोग धूमधडाक्याने हाऊस फुल्ल होत गेले. बॉम्बे थेटरात अंदाजे एकंदर ७५ ते ८० प्रयोग लागोपाठ झाले. त्यावेळी २५ प्रयोगांची शीग गाठताच रोप्य महोत्सव नि सुवर्ण महोत्सव करण्याची आधुनिक प्रथा जन्माला आलेली नव्हती. कै. वालचंद हिराचंदशेट सहकुटुंब नाटकाला आले होते. नाटक संपल्यावर बाहेर येताना मला भेटले. त्यांची सगळी मंडळी डोळे पुशीतच बाहेर येत होती. वालचंदशेट म्हणाले, "अस्पृश्योद्धारावर इसके हृदय पिळवटून टाकणारे परिणामकारक नाटक आम्ही आजच पाहिले. हे नाटक पाहून अस्पृश्यतेची किळस न येणारा माणूस, माणूस म्हणताच यायचा नाही. फार फार सुंदर नाटक लिहिलेत आपण. बामण-बामणेतर अस्पृश्यादी सर्व थरांतील जनतेने प्रयोग पाहिल्यावर आक्षेपांची ढगारे मुंबईपुरती तरी पार उधळून गेली.
महार जमातीचा आनंद
गगनात मावेना. त्यांचे हजारो स्त्रीपुरुष दर प्रयोगाला गर्दी करायचे. त्यांच्या पुढाऱ्यांनी तर रेडिओ स्टार्सच्या सगळ्या नटनट्यांना आणि स्नेही जणांना आपल्या मोहोल्यात नेऊन त्यांचा जाहीर सत्कार केला. एका ठिकाणी तर मेजवानी दिली. आहेर केले. हा प्रकार रेडिओ स्टार्स महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणच्या महार भगिनी बांधवांनी अत्यंत आपुलकीने केला. इतकेच नव्हे तर कोल्हापूरच्या काही हौशी महार तरुणांनी खरा ब्राह्मण नाटकाचा एक संचच तयार केला. त्यांचे प्रयोग रेडियो स्टार्सपेक्षाही उत्तम होतात, असा चक्षुर्वैसत्यम् पडताळा कै. अनंतराव गद्रे यांनी दिल्यामुळे तात्याराव सावरकर रत्नागिरीस असताना, त्यांनी त्या महार नटसंचाला रत्नागिरीला बोलावून, त्यांचा पतितपावन मंदिरात एक प्रयोगही करविला.
हे सगळे होत असताना, विविधवृत्ताच्या आलमगीराने एक विनोदी फुसकली सोडली. नाटकावर चांगला अभिप्राय दिल्यावर शेवटी "पण नाटकात पुण्याच्या माझ्या एका भोजनप्रिय दोस्ताची भपकराव भोजने पात्राने मनस्वी टिंगल केली आहे, याचा मला खेद होतो." हा टिंगलीचा संदर्भ भालाकार भोपटकरांविषयी असावा, या समजुतीने पुण्याचे बामणी वातावरण कलुषित व्हायला वेळ लागला नाही. आधीच ठाकरे आणि पुणेरी बामणं यांचे खडाष्टकच, तशात त्याच ठाकऱ्याने लिहिलेले हे नाटक आणि तशातही त्यात बामणांची नालस्ती केल्याची कुणकुण येथल्या वृत्तपत्रांनी जगजाहीर केलेली. कुणकुण काय नि खणखणाट काय, ठाकरेविरुद्ध आगपाखड करायला बामणांना इवलेसे कारण पुरेसेच होते.
मुंबईला नाटकाच्या भरघोस यशाचा सनदपट्टा पटकावल्यावर रेडिओ स्टार्स मंडळी किर्लोस्करात प्रयोग करण्यासाठी पुण्याला येऊन दाखल झाली. खरा ब्राह्मण नाटकाच्या जोडीला वरेरकरकृत नामानिराळा` हे आणखी एक नाटक त्यांनी आणले होते.
मला ठेचण्याचा बामणी निर्धार
रेडिओ स्टार्सने ‘खरा ब्राह्मण’ आणि वरेरकरांचा ‘नामनिराळा` या दोन नवीन नाटकांचे प्रयोग किर्लोस्कर थेटरात चालू केले. शिवाय सोबतीला त्यांची लोकप्रिय `बेबी` नाटिका होतीच. सगळे खेळ हाऊस फुल्ल जात होते. पुण्याच्या सिटी मॅजिस्ट्रेटने खरा ब्राह्मणाचे प्रयोग दोन वेळा स्वतः पाहिले. इकडे प्रयोग चालू असतानाच, पुण्याच्या भटांबामणात खरा ब्राह्मण फाशी देण्यासाठी साहित्याची तयारी चालूच होती. स्वजातियांच्या सह्या मिळविण्यासाठी स्वयंसेवक हिरिरीने घरोघर हिंडत होते. अखेर सुमारे ७-८ शे भटाबामणांच्या सह्यांचा तक्रार अर्ज लखोबा भोपटकरांच्या म्होरक्येपणाखाली जिल्हा मॅजिस्ट्रेटकडे पेष करण्यात आला. `सदर्हू नाटकात ब्राह्मण समाजाची बीभत्स नि अश्लील भाषेत अनाठायी बदनामी केली आहे; त्यामुळे आमच्या भावना मनस्वी दुखावल्या गेल्या आहेत; जातीजातीत वैमनस्य फैलावण्याचा हा अघोर गुन्हा झाला आहे. सबब नाटकाचे प्रयोग तात्काळ बंद पाडावे, नाटकाचे पुस्तक जप्त करावे, आणि १५३-अ आणि ४९९-५०० कलमांखाली नाटककर्ता ठाकरे याजवर खटला भरावा, अशा मागण्या त्या अर्जात केलेल्या होत्या. साहजिकच, विशेष तपासणीसाठी पोलीस खात्याची चक्रे फिरू लागली. सिटी मैजिस्ट्रेटने सरळ खुलासा केला. मी हे नाटक काळजीपूर्वक वाचले आहे. त्याचे येथे दोन प्रयोग स्वतः पाहिले आहेत, मला त्यात आक्षेपार्ह असे काहीही आढळले नाही नि दिसलेही नाही. सबब मी दिलेला प्रयोगाचा परवाना कोणत्याही मुद्यावर परत घेण्याचे किंवा तो रद्द करण्याचे कारण नाही. प्रोड्यूसरनी आपण होऊन नाटकाचे प्रयोग बंद केल्यास, तसे करण्यास ते मुखत्यार आहेत, पण मी मात्र तसा हुकूम देणार नाही. "
शकुनी मामाची शिष्टाई
रेडिओ स्टार्सच्या छावणीबरोबर शकुनी मामा वरेरकरही आले होते. या माणसाबद्दल कोणाला काहीही नि कितीही आदर असला, तरी स्वदेश हितचिंतकात तो प्रथम भेटला तेव्हापासून याची शकुनी वृत्ती मी ओळखून होतो. इतर कुणाचे बरे झालेले त्याला पहावत नसे. जेथे जेथे याचे पाऊल पडले तेथे तेथे एळकोटच उडाला. रेडिओ स्टार्सनाही त्याच्या शकुनी ऋणानुबंधाने मुंबईच्या रॉयल ऑपेरात `तुरुंगाच्या दारात’ बसण्याचा प्रसंग आला होता, त्या शकुनी मामाने नंदू खोटे (रेडिओ स्टार्सचे एक प्रमुख संचालक) याला अयाचित सल्ला दिला की
“हे पहा. नाटकावर पोलिसांची ब्ल्यू पेन्सिल पडली का त्याचे वाजलेच बारा. म्हणून ती तशी पडली नाही तोवर तुम्ही खरा ब्राह्मण नाटकाचे प्रयोग येथे (पुण्याला) बंद ठेवा नि कोल्हापूर गाठा. उगाच खटला चालविण्याच्या फंदात पडू नका.”
नंदूने मामाला माझ्याकडे आणले. त्याने हे पुराण अगदी जिव्हाळ्याच्या अभिनिवेशाने पण डोळ्यांतली पिचकणे काढीत काढीत मला सांगितले. मी उखडलो. "प्रयोग बंद करून कोल्हापूरला फरारी व्हावयाचा गांडूपणा नंदूला दाखवायचा असेल तर त्याने तो खुशाल दाखवावा. मी मात्र हा खटला स्वतः अखेरपर्यंत लढवणार आहे. नंदू सोबत असला ठीक, नसला तर त्याची मला पर्वा नाही. प्रश्न माझ्या इज्जतीचा आहे. या मामाचं काय? याच्या बदसल्ल्याने कुणी मरो जगो, हा नेहमीच नामानिराळा!" नंदूला ते पटले नि "जिथं तुमची जान तिथं माझी मान. चला, आपण हा खटला सोक्षमोक्षापर्यंत लढवलाच पाहिजे" असा त्याने तेख दाखवला.
निस्पृह नेत्यांनी पाठिंबा दिला
चौकशीचे समन्स येण्यापूर्वी `खरा ब्राह्मणा` चे प्रयोग रोज दोनदा चालूच होते. आम्ही रँग्लर परांजपे, ठक्कर बाप्पा, कुंझरू इत्यादी अनेक ख्यातनाम भारतीय नेत्यांना मुद्दाम आमंचून प्रयोग दाखविले. सर्वांचे अभिप्राय असेच पडले की अस्पृश्यतेसारख्या राष्ट्रीय दोषाचे निर्मूलन व्हायचे असेल तर अशीच नाटके वरचेवर झाली पाहिजेत. या कामी खरा ब्राह्मण हे खरोखर अभिनंदनीय नि परिणामकारक नाटक होय. वादाच्या पहिल्या सुगाव्यापासून ज्ञानप्रकाशचे अविस्मरणीय संपादक काकासाहेब लिमये यांनी खरा ब्राह्मण नाटकाचा खंबीरपणे पुरस्कार चालविला. प्रत्येक आक्षेपाला त्यांनी अग्रलेख लिहून जेव्हाच्या तेव्हा सणसणीत ठोकरले. भारत सेवक समाजाच्या सर्व धुरिणांनी आम्हाला यथोचित पाठिंबा दिला.
अखेर खटला चालू झाला
त्यावेळचे डेप्युटी कमिशनर गि. एहसान यांच्यापुढे चौकशी तपासणीचे काम चालू झाले. एहसान साहेबांची नेमणूक मुद्दामच करण्यात आली होती. ते इस्त्रायल असल्यामुळे मराठी भाषेवर त्यांचे साहजिकच चांगले प्रभुत्व होते. आमच्या बाजूने ५ प्रतिनिधी, सरकारतर्फे ५ आणि तक्रारखोरांच्या बाजूने ५ अशी योजना झाली. चौकशीच्या दिवशी पहातो तो बामणांच्या बाजूने २५-३० मंडळी आलेली, त्यांच्यातर्फे मुख्य आक्षेपक भोपटकर आणि चिपळूणकर, त्यांनी एकेक आक्षेप पुढे करावा आणि मी किंवा आमच्या प्रतिनिधींपैकी एकाने त्यावर जबाब द्यावा. आमच्या प्रतिनिधत श्री. भाऊसाहेब गडकरी, बॅ. गाडगीळ, एस. जी. वझे आणि प्रि. अण्णासाहेब खाड्ये होते. आक्षेपांना समर्पक पुराव्यानिशी उत्तरे देण्याचे काम बहुतेक मलाच करावे लागले. एक दिवसाआड याप्रमाणे पंधरा दिवस वादावादीचे तुंबळ युद्ध चालू होते. त्याचा तपशील देऊन जागा अडविण्यात अर्थ नाही.
प्रतिनिधींना नाटकाचा प्रयोग दाखवा
नाटकाच्या पुस्तकात आक्षेपार्ह काही नाही, असे जरी असले तरी प्रत्यक्ष प्रयोगात तसे काही कुठे दिसते का, याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी एहसान साहेबाने सर्व प्रतिनिधींसाठी एक प्रयोग मोफत करण्याची आज्ञा केली. मग हो काय विचारता? सारे थेटर गच्च भरून प्रेक्षकांनी आतल्या विंगाही काबीज केल्या. सारेच बनले प्रतिनिधी. त्या दिवशीच नर्तकीच्या कामासाठी एक खास नर्तिका स्टार्सला लाभली होती. प्रयोग भरघोस रंगत गेला. नर्तकीच्या नाचाला तर आक्षेपक नेत्यांनी वन्समोरच्या टाळ्या दिल्या. प्रयोगाला एहसान साहेब आणि बरेच सरकारी नि पोलीस अधिकारी सिटी मॅजिस्ट्रेटसह आले होते. प्रयोग पाहिला, त्यावर आक्षेप विक्षेपाची विचारणा ही कमिशनरनी केली. आक्षेपकांनी नाटकातील "बामनं काय बोलत्यात" या वाक्याला आक्षेप घेतला. तो एहसाननीच खोडून टाकला. आणि अखेर "या नाटकात तक्रारखोर म्हणतात तसे आक्षेपार्ह काही नाही, सबब नाटकाचे प्रयोग बिनतक्रार चालू करावे" असा निकाल सांगितला. तो रविवारचा दिवस होता. सोमवारी प्रयोग करण्याचे ठरले.
आडवा पडला पण नाक ठेचले
चौकशीत आम्ही विजय मिळवला. ज्ञानप्रकाशाने अग्रलेखात ‘उपनीत खरा ब्राह्मण’ मथळ्याच्या अग्रलेखाने खूप कौतुक केले. शकुनी मामाने आमचे नकली अभिनंदन केले, पण अंतर्यामी तो जळत होता. सोमवारी (म्हणजे निकालाच्या दुसऱ्याच दिवशी) प्रयोग जाहीर झाला. येथेही तो शकुनी मामा आडवा पडला. श्रावणी सोमवार म्हणजे लोकांचा उपासाचा दिवस उपास सोडून सायंकाळच्या ६ च्या प्रयोगाला फारसे लोक येणार नाहीत. तेव्हा ६ वाजता ‘खरा ब्राह्मण’ लावा नि नंतर १० ला माझ्या ‘नामानिराळा’ चा प्रयोग ठेवा, असा त्याने नंदू खोटेला सल्ला दिला. मला विचारले. मी म्हटले, “केव्हांही लावा. माझी काही हरकत नाही. उपासाचा दिवस असल्यामुळे ‘खरा ब्राह्मण’ ला गर्दी होणार नाही नि रात्रीचा मामाचा खेळ भरगच्च जाईल, हाच त्याचा हेतू आहे ना ? होऊन जाऊ द्या.” सकाळी ८ च्या सुमाराला ३-४ बामण पेहलवान नंदू नि नायमपल्लींना किर्लोस्कर थेटरात त्या दिवशी मुद्दाम येऊन भेटले. "लोकमताला (म्हणजे पुण्यातल्या तक्रारखोर भटाबामणांच्या मताला ) धुडकावून सरकारने जरी खरा ब्राह्मण नाटकाला परवानगी दिली, तरी आम्ही महाराष्ट्र मंडळाचे तालीमबाज गडी आजचा प्रयोग होऊ देणार नाही, याची याद राखा." अशी धमकी देऊन गेले. दोन्ही नाटकांची तिकीटविक्री सकाळपासून चालू झाली. धमकीची भुमका सगळीकडे फैलावली. सायंकाळी चारच्या सुमारासच थेटरासमोरची दुकाने सोमवारचा उपास म्हणून बंद झाली. ५ च्या सुमारास पहातो तो दुकानांच्या फळ्यावर पुण्यातले शंभरावर तालीमबाज गडी लाल लंगोट कसून हारीने बसलेले. त्यांच्या वस्तादांनी थेटरात येऊन सांगितले, "नाटक बंद पाडायला महाराष्ट्र मंडळाची भटं येणार आहेत ना? त्यांचा समाचार घ्यायला ही बघा आमची सेना जय्यत तयार बसलेली आहे. पहातो कोण आवाज काढतो तो.
संबंध दिवसभर शकुनी मामा वरचेवर तिकिटविक्रीजवळ येऊन विचारीत होता, ‘खरा ब्राह्मण’ ची तिकिटे किती विकली नि त्याच्या ‘नामानिराळा’ ची किती विकली. साडेपाच पासून थेटरावर प्रेक्षकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या, थेटर चिक्कार भरले. ‘खरा ब्राह्मण` श्री तिकीटविक्री झाली ३७५ रुपयाची नि ‘नामानिराळा` ची झाली अवघे ३४ रुपये. मामांचा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला. `रात्री चढेल त्यावर एक टिंब हेही बोलायला तो कचरला नाही. भलताच आशावादी म्हणायचा.
बरोबर ६ वाजता खरा ब्राह्मणचा प्रयोग चालू झाला. "बामनं काय बोलल्यात" या वाक्यप्रयोगाला बामण-सेनापती भोपटकर यांनी घेतलेला आक्षेप जरी डे. कमिशनरने फेटाळला होता, तरी या प्रयोगाच्या वेळी मी होऊन एक नवी कलाटणी दिली. "बामनं काय बोलत्यात" या ऐवजी "श्यानं काय बोलत्यात असा बदल केला. त्याचा परिणाम भलताच झाला. थेटरात म्हादबा पाटलाने " श्यानं काय बोलत्यात " वाक्य उच्चारले का बाहेर बसलेले तालीमबाज लोक मोठ्याने "बामनं काय म्हंगत्यात" अशी गर्जना करायचे. या घटनेवर मंगळवारच्या ज्ञानप्रकाशात हा बदल कोणी केला असेल तो असो. पण त्याने आक्षेपकांच्या मर्मावर ओवरबौण्ड्रीचा टोलाच हाणला म्हणायचे." असा उल्लेख केला. पुण्याला आणखी एक महिनाभर सारखे प्रयोग करून रेडिओ स्टार्स भरगच्च गल्ल्यासह कोल्हापूर दख्खनच्या दौऱ्यावर गेली. स्टार्सच्या ऋणानुबंधाने माझ्या संसारयंत्राला वंगण मिळाले. यावेळी पुण्यातच मुंजाबाच्या बोळात मी बिऱ्हाड थाटले होते.
भलतीच ब्याद गळ्यात पडली
यावेळी महाराष्ट्र नाटक मंडळी बंद पडून त्यातले बरेच नट बेकार फिरत होते. त्याना एकत्र करून लेले आणि गुंड नावाच्या दोन इसमांनी नवी नाटक कंपनी काढायचे ठरविले. `खरा ब्राह्मण’ नाटक यशस्वी झाल्यामुळे ती मंडळी माझ्याकडे नवीन नाटक मागण्यासाठी आली, त्यांना काळाचा काळ हे गद्य नाटक देण्याचे ठरले. माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे दूर कोठेतरी तालमी देण्यासाठी येण्याजाण्याचे मला जमणार नाही, म्हणून त्यांनी शेजारीच नातूच्या बागेत त्या नव्या नाटक कंपनीची छावणी ठोकली. सुमारे महिनाभर जमलेल्या १०-१२ मंडळीचा योगक्षेम लेले-गुंड दुकलीने ठीक चालविला. तालमीही चालू होत्या. अचानक एक दिवस त्या दुकलीने "भांडवलासाठी बाहेरगावी जाऊन येतो " असे सांगून जो पोबारा केला तो कायमचा. मंडळींची उपासमार होत गेली. अखेर मला त्यांची तात्पुरती सोय करावी लागली. नाटक चांगले वठत चालले होते. मंडळीही कसलेली होती. ‘खरा ब्राह्मण’ ‘काळाचा काळ’ आणि ` विधिनिषेध` ही तीन नाटके उत्तम वठली होती. तुम्ही आमच्या फक्त भोजनाची व्यवस्था लावा, थोड्याच दिवसांत आपण येथे प्रयोग चालू करू. म्हणजे कंपनीला काही स्थैर्य येऊन व्यवहाराचा पुढचा मार्ग मोकळा होईल. आम्हाला पगाराची किंवा आणखी कशाचीही अपेक्षा नाही. सहकारी तत्त्वावर श्रम करून एक नाट्यसंस्था चालविण्याची आमची हिंमत आहे. असा सगळ्यांचा आग्रह झाला. मीही बेकारच होतो. म्हटले, चला, ही मंडळी म्हणताहेत तर आपणच यांच्या सहकारावर स्वतंत्र नाटक मंडळीचा व्यवसाय का हाती घेऊन नये?
डेक्कन स्पार्क्स नाट्यसंस्थेची स्थापना
कामचलाऊ भांडवलाची सोय केली. तालमी चालू झाल्या. इतर स्थानिक नाट्यप्रेमी मंडळींचाही पाठिंबा मिळत गेला. पुण्यातला नामांकित व्हायलिनवादक हिरालाल मदतीला आला. राजाभाऊ परांजपे हार्मोनियमची साथ द्यायला धावले. आम्ही थेटर मिळविण्याची खटपट करीत आहोत, तोच पुण्याला प्लेगचा भडका उडाला. रोज १००-१२५ केसीस होऊ लागल्या. लोक भराभर बाहेर गेले. थेटरे बंद पडली. मी हे नाटक मंडळींचे लटांबर घेऊन जायचे कुठे ? भलताच पेचप्रसंग तो. बरे, त्यांना रजा देऊन मोकळे व्हावे तर आजवर हजार दीडहजारावर रुपये खर्ची घातले, त्याची वाट काय? त्यांना होते तसेच सांभाळावे तर त्यांच्या योगक्षेमाचा भरमसाट खर्च किती दिवस सोसायचा? प्लेग केव्हा बंद होणार, ते तरी सांगणार कसे? आणि बंद झाला, तरी तो बंद होताच नाटके पहाण्याइतकी लोकांची स्थिरस्थावर होणार आहे थोडीच ? घरातल्या मंडळींबरोबरच कंपनीतल्या सगळ्यांना प्लेगची लस टोचवून घेतली. अशाही परिस्थितीत नाटकांच्या तालमी चालल्याच होत्या. अचानक आणखी एक प्रसंग गुदरला. एक गडी मेनन्जायटीसने पछाडला गेला. त्याला वात झाला. आरडाओरडा करू लागला. त्याला इस्पितळात पोहोचवावा तर तो इतका बेफाम झाला की जवळपास कोणालाच येऊ देईना. तो फक्त मला भ्यायचा नि आदराने वागायचा. खाली टांगा तयार ठेवला. मी माडीवर गेलो नि त्याला चार शब्द सांगून त्याच्या पाठीवर हात फिरवला. कसाबसा टांग्यात घालून इस्पितळात दोघातिघांनी पोहचता केला. ७-८ दिवसांनी तो वारल्याची बातमी आम्हांला कळली.
महात्मा गांधींची मुलाखत
खरा ब्राह्मण खटल्याची आग विझली होती. पण अजून धुमसणी होतच होती. माझे बिऱ्हाड त्यावेळी भिक्षुक भटांच्या अड्ड्यात म्हणजे मुंजाबाच्या बोळात होते. एके दिवशी भाऊराव पाटील सकाळीच तेथे भेटायला आला. "हे पहा दादा, महात्मा गांधी अलिकडे हरिजन फंडाच्या दौऱ्यावर आहेत. सध्या त्यांचा मुक्काम पुणे रेल्वे स्टेशन पलीकडच्या टेकडीवरील पर्णकुटी बंगल्यात आहे. काल मी तेथे गेलो आणि त्यांची मुलाखत ठरवून आलो. मी माझ्या गुरुला बरोबर घेऊन येणार आहे, तेव्हा त्यांनाही निमंत्रणाचे पत्र धाडा. असे सांगितले आहे. मला काल मिळाले. आज बहुतेक तुम्हाला येईल. आले तर आजच जायचे त्यांच्या भेटीला. हरिजनांसाठी म्हातारा लाखो रुपये जमवीत आहे आणि इकडे आपल्या हरिजनांच्याच शाहू छत्रपती बोर्डिंगात सकाळसंध्याकाळची तोंडमिळवणी होत नाही. हरिजन फंडातून आपल्याला काही तरी ठोक रक्कम काढली पाहिजे." हे बोलणे चालले असतानाच पोस्टमनने माझ्या नावावर आलेले म. गांधींच्या चिटणिसाचे कार्ड हाती दिले.
आम्ही १० च्या सुमाराला टांगा करून पर्णकुटीच्या पायथ्याशी गेलो. एका निवांत बाजूच्या टेकडीवरचा कै. शेट विठ्ठलदास दामोदर ठाकरसींचा तो राजेशाही थाटाचा बंगला. खंडेरायाच्या देवळाला नऊ लाख पायरी या कवनाप्रमाणे पर्णकुटीला चढण्यासाठी रुंदरुंद अशा संगमरवरी शंभरेक पायऱ्या. दोन्ही बाजूला प्रशस्त ओटे, त्यावर जागोजाग फुलझाडांच्या कुंड्या खालपासून वरपर्यंत ठेवलेल्या. म. गांधींसारख्या पुरुषश्रेष्ठाच्या दर्शनाला जायचे तर एवढी चढण केलीच पाहिजे. चढण संपली आणि आम्ही एका दर्शनी लहानशा स्वागतहॉलमध्ये येऊन दाखल झालो. तेथे एक लुंगीवाला बसला होता. शेजारीच खुर्चीवर कोणीतरी गयावळ चेहऱ्यामोहोऱ्याचा वयस्कर गृहस्थ वृत्तपत्र वाचीत बसला होता. बहुतेक सारस्वत असावा. आम्ही येताच तो लुंगीवाला “हू आर यू?" करीत उठला. आम्ही महात्माजींच्या भेटीला आलो आहो. असे मी इंग्रेजीत सांगितले. तो तुम्हाला भेटीच्या निमंत्रणाचे पत्र आले होते काय ? मी-होय, तो-दाखवा मला, मी-पत्र आणले नाही. तो तर मग भेट मिळणार नाही. मी- शटप् यू वॉचडॉग, सातारचे भाऊराव पाटील आणि ठाकरे आले आहेत. असं जा वर जाऊन सांग, जास्त वटवट करू नकोस. असे मी जोरकस आवाजात कडाडताच शेजारीच असलेल्या जिन्याच्या तोंडाशी म. गांधी आणि काका कालेलकर येऊन उभे राहिले. "आयिये, भाऊरावजी, आयिये" असे गांधीजींनी म्हणताच आम्ही वर सरकलो. जाताना त्या लुंगीधरावर त्रितीयनेत्री जळफळता कटाक्ष फेकायला मात्र मी विसरलो नाही.
एका प्रशस्त दिवाणखान्यात आमची बैठक बसली. गांधीजींच्या समोर मी माझ्या उजव्या हाताला भाऊराव, तेथे जवळच बेळगावचे गंगाधरराव देशपांडे, गांधींच्या पाठीशी काही अंतरावर काका कालेलकर (त्यावेळी दाढी मिशांचे दण्डकारण्य नव्हते. अगदी क्लीनकट.) आणि पलीकडच्या खोलीत कोणीतरी (बहुतेक दाक्षिणात्यच) लघुलेखक चोपडे सरसावून बसलेला. परस्पर प्रस्तावना झाल्या. गांधीजी कहिये, कहिये ठाकरेजी. मी (इंग्रेजीत) महात्माजी, मला आपल्याशी इंग्रेजीतच बोलावे लागेल. कारण, मला हिंदी भाषा तितकीशी येत नाही. हास्याचा खोकाट करीत महात्माजी उद्गारले (यापुढची सगळी बोलणी इंग्रेजीतच झाली. ) "इंग्लिश भाषा ही भारताची आल्मामेटर व्हावी, असे तुमचे मत आहे काय?" (येथे गांधींची एक गोम लक्षात ठेवण्यासारखी आहे. एखादा मूळ मुद्दा टाळायचा असला का चटकन ते समोरच्याला दुसऱ्याच निराळ्या मुद्याकडे खेचून बोलायला लावीत. मी हे ओळखले.) मी महात्माजी, इंग्लिश भाषा भारताची आल्मामेटर व्हावी का हिंदी व्हावी, याचा वाद घालायला मी आलो नाही. आपल्याच हातून ज्याचे उद्घाटन झाले, त्या सातारच्या भाऊराव पाटलाच्या हरिजन बोर्डिंगाचे पैश्याच्या अभावी होत असलेले हाल आपल्या कानावर घालावे आणि ते वेळीच तारण्यासाठी आपल्या हरिजन फंडातून तात्काळ काही ठोक रकमेचे वार्षिक अनुदान मिळावे, ही विनंती करण्यासाठी समोर बसलो आहे. आज होय किंवा नाही ते स्पष्ट समजल्याखेरीज आम्ही येथून उठणार नाही.
येथे गांधीजींचा बालिष्टर जागा झाला. आणि ते आडवे तिडवे प्रश्न विचारू लागले. "द्रव्यसहाय्याचा ओढा निर्माण करण्यापूर्वी भाऊरावाने बोर्डिंगाचा डोंगर माथ्यावर घेण्यात चूक झाली, असे नाही का ठाकरेजी तुम्हाला वाटत? हरिजन फण्ड तो किती आणि"(येथे मीच अडवून ठासून सांगितले) "किती म्हणजे ? पाऊण लाखावर जमला आहे, असे वृत्तपत्रांतच जाहीर झाले आहे." गांधीजी ते खरे आहे. पण त्याला मागण्या किती? त्या फंडाची घटना आहे. कार्यकारी मंडळ आहे. अस्पृश्यतानिवारक ठिकठिकाणच्या संस्थांच्या कामगिरीची चौकशी ते करतात. योग्यायोग्य ठरवून काही देता आले तर देतात.
मी -- या चित्रात आपण कुठेच कोणी नाही, असं का आम्ही समजायचे ?
गांधी -- मी आहे भीकमाग्या भिकारी. (अ बेग्गर विथ अ बाऊल.) मिळेल ती भीक नेऊन टाकतो कार्यकारी मंडळाच्या झोळीत. माझ्या हातांत काय रहाते? तुम्ही दिल्ली कचेरीला अर्ज पाठवा.
मी -- अर्ज कशाला? हा घ्या पाटलाच्या बोर्डिंगच्या कामाचा नि आजवर त्याने केलेल्या हरिजनोद्वाराच्या अनेक कामांचा छापील रिपोर्ट.
गांधी-एवढा मोठा रिपोर्ट वाचायला मला कुठं बरं वेळ आहे ? मी सारखा फिरत असतो. तुम्ही थोडक्यात रिपोर्टाचा सारांश (सिनॉप्सिस) काढून दिला तर फुरसदीने वाचीन.
मी -- आम्हीच कशाला सिनॉप्सिस काढायला हवे. तो पलीकडे तुमचा शॉर्टहॅण्ड रायटर बसला आहे ना आपल्या संभाषणाचे लघुलेखन करीन. त्याला सांगा. (विकट हास्याने हा मुद्दा बाजूला सारतात.) गांधीजी, आपण मला म्हणाला की आधी पैशाची तरतूद केल्याशिवाय भाऊरावने बोर्डिंगचे काम कशाला अंगावर घेतले म्हणून. हे पहा, स्पष्ट बोलतो, क्षमा करा. अस्पृश्यांच्या उद्धारासाठी तनमनाने काम करणारे जे कोणी थोडे आहेत, ते आपापल्या परीने झटत झगडत असतातच. आपल्या जीवनाचे ते एक व्यसन बनवितात. काही यत्न छोटे असतात, काही मोठे असतात. पण असतात. मीच काय तो एकटा हरिजनोद्धारक, असा आपला समज असेल, तर तो अस्थायी आहे. नुकतेच मी अस्पृश्योद्धारावर लिहिलेले संत एकनाथांच्या चरित्रावरचे नाटक ‘खरा ब्राह्मण’ रेडिओ स्टार्सच्या रंगभूमीवर येताच, पुण्यातल्या ब्राह्मण मंडळींनी त्यावर केवढे भयंकर काहूर केले. ते कदाचित आपल्या कानावर आले असेल.
गांधी -- (कालेलकरांकडे वळून) यह सच्ची बात है काका ?
काका -- (गंभीर खर्ज आवाजात) आजच्या सकाळ दैनिकात वाचला होता काही त्रोटक मजकूर.
मी -- काका इतर मराठी पत्रे वाचीत नाहीसे दिसते. गेला महिनाभर ज्ञानप्रकाशचे बहुतेक स्तंभ याच प्रकरणाने भरून येत आहेत.
काका -- माझ्या पहाण्यात नाही. मीही फिरतीवर असतो.
मी -- नाटकाचे राहू द्या. त्याचे एवढे ते काय, त्यावर खटला झाला. नाटक निर्दोष ठरले. प्रयोग होताहेत. पण आज इतकी वर्षे भाऊराव हरिजनांसाठी स्वतःच्या संसारावर पाणी सोडून झटत झगडत आहे. अहो, परवा त्याच्या सौभाग्यवतीने बोर्डिंगमधल्या हरिजन मुलांची उपासमार टाळण्यासाठी गळ्यातले मंगळसूत्रही बाजारात विकले. त्याच्या कार्याची, गांधीजी, आपल्यासारख्या महात्म्यांनी काही बूज राखायला हवी का नको ?
गांधी -- (हिंदी) हाँ हाँ, क्यों नही, हरिजनके बारेमे इतनी बडी तकलिफ उठानेवाला भाऊरावसरिका उनका तारणहार मैने और कही देखा नही. भाऊराव महाराष्ट्रका एक भारी भूषण है.
मी -- या सर्टिफिकेटाने का त्याच्या कार्यातल्या अडचणी दूर होणार आहेत ? आपण म्हणता, आयाम ए बेग्गर विथ ए बौल. आपण बेग्गर तर खरेच, पण रॉयल बेग्गर आहात नि भाऊराव रिअल बेग्गर आहे. आज रॉयल बेग्गरकडे रिअल बेग्गर बीक मागायला आला आहे.
गांधी -- ( खदखदा हासत) हम रॉयल बेग्गर कैसे, ठाकरेजी ?
मी -- हो. रॉयल नाही तर काय? ताजमहालाला लाजवील अशा या पर्णकुटीत आपली वसती नि येथे बसून आपण हरिजनांच्या उद्धाराची चिंता वहाणार ! उंच अंतराळी विमानात बसल्या बसल्या खाली पृथ्वीवरच्या गटारांत वळवळणाऱ्या किडी कीटकांचा उद्धार करण्याची प्रवचने झोडण्यासारखेच आहे हे. भाऊराव हरिजनांबरोबरच झोपडीत रहातो. त्यांच्याबरोबर खातो पितो.
गंगाधरराव -- अहो, ठाकरे, कुणापुढे बसून तुम्ही हे बडबडत आहात, याचा काही विचार ? माणसाने आपली पायरी सोडू नये.
मी -- अहो गंगाधरराव, डोळे वटारून इतके गुरकाऊ नका. त्या डोळ्यांत वडस म्हणून वाढलो तर सात पिढ्या कायम उमटेन. तुमच्यासारख्यांनी हांजी हांजी करून चालविलेल्या गांधीजींच्या बुवाबाजीला मला टेकू द्यायचा नाही. मी आहे फटकळ.
गांधी -- जाने दो, जाने दो गंगाधर रावजी. ठाकरेजी इज द अॅडव्होकेट ऑफ अवर भाऊराव.
भाऊराव -- अॅडव्होकेटच नहे महात्माजी, माझे गुरू नि मार्गदर्शक आहेत हे.
मी -- मी असेन अॅडव्होकेट, पण आपण बॅरिस्टर आहात नि वादविवादात नि विधानकौशल्यात आपण ब्रिटिशांनाही पाणी पाजले नि पाजीत आहा. हे राहू द्या. बोला. हरिजन फंडातून आपण भाऊरावला किती मदत करणार आहात ते बोला.
गांधी -- मला चार महिन्यांची मुदत द्या. योग्य ते अगत्य करीन.
मी -- चार महिन्यांची? छे छे. फार तर एक महिन्याची. (त्यावर ३ महिने २ महिने, अशी घासाघीस झाली पण ती सारी हास्यविनोदात.)
गांधी- यू आर ए स्टिफ अॅण्ड स्टबॉर्न फेलो, मिस्टर ठाकरे, मी आजच तुमचा रिपोर्ट पाठवून दिल्ली कचेरीला पत्र लिहितो. झाले ना तुम्हा दोघांचे समाधान.
मी -- आपला मी फार आभारी आहे. पण महात्माजी एक महिन्याची मुदत संपली नि योग्य जवाब आला नाही, तर मात्र आपण जेथे असाल तेथे अस्साच येऊन उभा राहीन, हे लक्षात ठेवा.
गांधी -- यू बोथ आर वेलकम एनी टाईम एनी व्हेअर.
आम्ही निरोप घेऊन गडाखाली उतरलो. ऊन्ह कडाडले होते. परतताना तेथे टांगा कुठला? पायपिटी करीत स्टेशनवर आलो नि तेथे टांगा केला. भाऊराव साताऱ्याला गेला.
पंधरा दिवसांनी भाऊराव परत आला. माझ्या हातात एक पत्र ठेवले. हरिजन फंडाच्या दिल्ली कचेरीने ते त्याला सातारच्या पत्त्यावर लिहिले होते. "आपल्या शाहू छत्रपती हरिजन बोडिंगला दरसाल एक हजार रुपयांचे अनुदान देण्याचा कार्यकारी मंडळीने ठराव केला आहे. लवकरच चेक पाठविण्यात येईल." असा त्यातला मजकूर,
मी म्हटले, "भाऊराव, दंडा दाखविल्याशिवाय परमेश्वरही प्रसन्न होत नाही, असा तुझा माझा ग्रहयोग आहेसा वाटतो. "
यानंतर दोन वर्षांनी म. गांधी अकोल्यास हरिजन-कार्यविरोधी लोकांच्या सत्याग्रही घेरावात अडकले असताना, माझी त्यांची विलक्षण परिस्थितीत भेट झाली, ती हकिकत पुढे येईल.
पुण्याचा प्लेग हटला
अखेर श्री आणि कंपनीने विजयानंद थेटरात स्पार्क्सचे खेळ चालू करण्याची हिंमत दाखवली आणि दि. ९-२-१९३४ शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजता `विधिनिषेध` या नवीन नाटकाचा पहिला प्रयोग साजरा केला. स्पार्क्सच्या उभारणीसाठी ज्या ज्या थोर लोकांनी देणग्या दिल्या होत्या, त्या सर्वांना सन्मानाने निमंत्रित केले होते. श्री. ताम्हणकरांनी ऐन पहिल्या प्रयोगालाच नाटकाची पुस्तके थेटरात विकली, प्रयोग उत्तम वठला. ज्ञानप्रकाशच्या कै. काका लिमयांनी प्रयोगाची फार स्तुती केली. माझ्या पुण्यातल्या वास्तव्यात हरएक प्रसंगी कै. काका लिमयांनी माझी बाजू अगदी आदेशाने नि आत्मीयतेने उचलून धरली. `खरा ब्राह्मण` प्रकरणी तर त्यांनी अनेक अग्रलेख ज्ञानप्रकाशात लिहून प्रतिपक्षांना जेरीस आणले. त्या आठवणी मी माझ्या हृदयावर कृतज्ञतेने कोरून ठेवल्या आहेत. विजयानंदात "विधिनिषेध` आणि `खरा ब्राह्मण नाटकांचे प्रयोग आठवड्यात तीनदा होत गेले. या सुमारास लोकांची मनोवृत्ती प्लेगने घायाळ केल्यामुळे, जमाखर्चाची फक्त तोंडमिळवणी होण्यापुरते उत्पन्न व्हायचे.
कुठे कुणाचे जरा बरे होत आहेसे दिसले का त्यात फांदे फोडून अडथळे आणण्यात पुण्याचा एक ठराविक वर्ग नेहमीच तरबेज. त्यानी हवेत अशी एक बातमी फैलावली की "ठाकरे आणि रेडिओ स्टार्स याचे फाटल्यामुळे, ठाकऱ्यांनी आता खरा ब्राह्मण स्वतंत्र चालू केला आहे.” ही बातमी पुणेरी पत्रात वाचताच, श्री. नंदू खोटे यांनी तार पाठवून कळविले की " पुढच्या खरा ब्राह्मण` प्रयोगात मी स्वतः विठू महाराचे काम करणार अशी जाहिरात द्या." ज्ञानप्रकाशने या वार्तेचा खूपच गाजावाजा केला. अखेर त्या प्रयोगात श्री. नंदू खोटे यांनी मुंबईहून मुद्दाम येऊन ती भूमिका गाजवली आणि निंदकांचे बत्तीसच्या बत्तीस दात पाडले..
साडेसातीची पावणेआठी
डेक्कन स्पार्क्सच्या नाट्यप्रयोगांचा बोलबाला ऐकून नि प्रयोग पाहून अहमदनगरचे मुथा नावाचे एक कंत्राटदार घिरट्या घालू लागले. जातीचा मारवाडी, पण वेष अगदी पांढरपेशासारखा. भाषा शुद्ध मराठी बोलायचा. नगरला सध्या कोणतीही नाटक कंपनी नाही, थेटर पक्के उत्तम. आपण सांगाल त्या अटीवर मी कंत्राट घ्यायला तयार आहे, असा त्याने मोहजाल टाकला. दामाजीच्या बाबतीतली माझी परिस्थिती मला माहीत. कुठून तरी पैशाची सोय लावल्याखेरीज भागणार नव्हते. प्लेगने हैराण झालेल्या पुण्यात नाटकांचे उत्पन्न फारसे होईच ना. बाहेरगावी गेलो तर काही हातभार लागेल, अशा विचाराने मी अटी ठरविल्या. मुथाने सगळी मंडळी पुण्याहून स्वतःच्या वाहनाने नि खर्चाने नगरला न्यावी. तेथील बिऱ्हाडाची सोयही त्यानेच आपल्या खर्चाने लावावी. थेटरचे आणि जाहिरातीचे भाडे वगैरे त्यानेच सोसावे. आम्ही फक्त आमच्या भोजनाचाच खर्च काय तो करू. पावसाळा माथ्यावर आलेला. त्याने नगर जिल्ह्यात याच अटीवर कंपनीला कोठेही फिरवावे आणि अखेर सप्टेंबरच्या सुमाराला सगळा खर्चवेच करून कंपनीला धुळे मुक्कामी नेऊन पोहचवावे. या व्यवस्थेबद्दल नाटकांच्या उत्पन्नातून त्याने १० आणे घ्यावे आणि ६ आणे आम्हांला द्यावे. असा रुपयाच्या स्टँपवर करारनामा लिहून घ्या, असे मी कंपनीच्या व्यवस्थापकाला सांगून, कोल्हापूरला गेलो.
कोल्हापूरचा कळवळा
कोल्हापूरला ८-१० दिवसांचा मुक्काम झाला. तेथे माझे हितचिंतक स्नेही बरेच. कै. बाबुराव रुअीकर यांनी त्या सगळ्यांना एका बैठकीत बोलावून माझ्या उद्योगाला रोख द्रव्यसहाय्य गोळा करण्याची खटपट केली. तीनशे रुपये जमा झाले. इतक्यात आमच्या शहाण्या मॅनेजरची तार आली की "मुथाने कंपनी नगरला नेली आणि माझ्या कुटुंबाची सोय आप्पा बळवंत चौकात सोयीस्कर लावली." या घिसाडघाईचे कारणच मला उमगेना. स्वतःचे कुटुंब आणि परगावी गेलेली अथवा नेलेली कंपनी, अशा दोन ठिकाणी माझ्या विवंचनेची कातर तयार झाली. तात्काळ मी १०० रुपये तारेने नगरला कंपनीकडे पाठवले आणि ५० रुपये सौ. च्या नावाने पुण्याला रवाना केले.
इतुकियात वर्तली एक माव
एक हातभर लांब खलिता घेऊन कोल्हापूरला सरकारचा एक घोडेस्वार माझी चौकशी करीत महाद्वारात भटकत होता. खलित्यावर फक्त " प्रबोधनकार ठाकरे, कोल्हापूर ". एवढेच नाव नि पत्ता. सुदैवाने तो दासराम बुक डेपोला भेटला. त्यांनी "अरे, बागल वकिलांच्या वाड्यावर जा, तेथे ते उतरले आहेत. असे सांगितले. घोडेस्वार तेथे आला नि त्याने तो " खलिता मला देऊन सही घेतली, हातभर खलिता नि त्यात एक इवलिशी चिठ्ठी दिवाणसाहेब सुर्वे यांची. आपण मला येऊन भेटल्यास आभार होतील.
कै. शाहू महाराज दिवंगत झाल्यापासून मी कोल्हापूरला गेलोच नव्हतो. पण आता गेलो. म्हणून दोन तडाखेबंद जाहीर व्याख्याने लोकांनी करविलीच. छत्रपती राजाराम महाराज यांची तोंडओळखही नव्हती. मी दिवाणसाहेब सुर्वे यांना भेटलो. तास दीडतास अनेक विषयांवर आम्ही मनमोकळी चर्चा केली एक दोन वेळा "बरंय आता रजा द्यावी म्हणून मी उठण्याचा यत्न केला. पण "थांबा हो. तुमचे भाषण ऐकणे. ही एक मेजवानीच असते." (युअर टॉक इज अ स्प्लेण्डीड ट्रीट) सुर्वे मला रजा का देत नाहीत, याचे कारण लवकरच उमगले. इतक्यात एक हुजऱ्या आत आला नि म्हणाला " साहेब, सरकारस्वाच्या आल्याति. चला, आपण महाराजांना भेटू या" म्हणत सुर्वे यांनी मला बाहेर आणले. पहातो तो छत्रपती राजाराम महाराज आणि अक्काबाई साहेब महाराज गाडीजवळ पायउतारा उभे. मी मुजरा केला. महाराज नुसतेच माझ्याकडे पहात होते. आक्काबाईसाहेब म्हणाल्या "लई वरसानंतर आपलं भाषन कोल्लापुरला जाल न्हवतं अलिकडं तुमी आमच्या कोल्लापुराला का येत नाही ? थोरल्या महाराजांच्या येळला लई वखत येत व्हता." मी "होय सरकार. त्यावेळी छत्रपती शाहू महाराज वरचेवर बोलवायचे महत्त्वाची काही कामे करून घ्यायचे. आता तसं काही होत नाही, म्हणून येणेजाणे होत नाही. क्षमा असावी. बरा येत जात ऱ्हावा असे म्हणत दोघेही गाडीत बसले नि भुर्कन निघून गेले. उद्या सकाळी १० च्या सुमाराला आपण माझ्या कचेरीत येऊन भेटा, असे सांगून दिवणसाहेब सुर्वे यानी मला निरोप दिला. दुसरे दिवशी त्यांनी कचेरीत मला रु. २०० चा चेक आपल्या साहित्यसेवेबद्दल पारितोषिक म्हणून दिला. लगेच मी पुण्याला आलो.
चक्रव्यूहाच्या चक्करभेंडीची सुरुवात
नव्या बिन्हाडात पाऊल टाकतो तोच तेथे करंदीकर नावाचे एक अनुभवी व्यवस्थापक म्हणून लाभलेले गृहस्थ वक्रतुंड करून बसलेले. “काय हो, तुम्ही का आलात नगरहून?" करंदीकर " काय करणार. मंडळीच्या बिऱ्हाडाची सोय तेल्यांच्या प्रशस्त धर्मशाळेत नीट लागली. पण शिधासामुग्री संपली म्हणून आलो. प्रवासाचे कपडे उतरण्यापूर्वीच मी त्याला ५० रुपये दिले आणि " मुथाला सांगा, मी आलो आहे. ताबडतोब स्टेशन वॅगन पाटवून आम्हांला नगरला नेण्याची व्यवस्था कर" असा निरोप सांगितला. ४-५ दिवसांनी गाडी आली आणि पुण्याचे बिऱ्हाड मोडून आम्ही नगरच्या तेल्यांच्या धर्मशाळेत दाखल झालो.
धर्मशाळाच ती. तिथे खोल्या वगैरे नाहीत. नुसते लांबरुंद हॉलच हॉल. स्वयंपाक घराची सोय खाली. शेजारी पाण्याचा नळ त्यातले पाणी तांबडमातीमिश्रित. चौकशी करता साऱ्या नगरला असेच पाणी, ठीक आहे. चारचार पदरी गाळणीतून मूठमूठभर माती हातात यायची. नगरला श्री. पारखे नामांकित वकील होते. ते प्रबोधनाचे नि माझे कट्टर अभिमानी नि चहाते. त्यांनी एका वाण्याकडे आमच्या दाण्यागोट्याची सोय लावली. शिवाय तेथले अनेक लोक मला भेटायला येत जात असत. नाटकाच्या तालमी चालू केल्या. ७-८ दिवसांत तेथल्या थेटरात नाटके लावण्याची आणि आमच्या बिऱ्हाडाची सोय लागली. धर्मशाळा सोडून आम्ही थेटरात रहायला गेलो.
नगरला खरा ब्राह्मण
अहमदनगरला थेटरात रहायला गेल्यावर नाटकांचे प्रयोग होण्यापूर्वी श्री. पारखे वकील यांच्या अध्यक्षतेखाली, थेटरच्याच प्रांगणात, नाट्यकलेवर माझे एक व्याख्यान झाले. कंपनी येथे येण्यापूर्वीपासूनच पुण्याच्या द्वाड वृत्तपत्रांनी स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांची आणि जनतेची मने कलुषित करण्याची खूप यातायात केली. `खरा ब्राह्मण` ला परवानगी द्यावी का नाही, याचा मामलतदार कचेरीत तंगडझाड खटाटोप चालू झाला. जिल्हा मॅजिस्ट्रेट श्री. देशमुख यांना मी नाटकाचे छापील पुस्तक दिले नि स्वतः भेटून योग्य तो खुलासा केला. त्यांनी ताबडतोब परवानगीचा हुकूम काढला. तरीही "नगरात खरा ब्राह्मण’ वर सरकारी बंदीच्या बातम्या पुण्याच्या पेपरांत येतच होत्या. मुथाने मात्र प्रयोगाच्या आधी जाहिरातीची फारच जोरदार मोहीम काढली. अखेर नाटक लागले नि त्याचे प्रयोग हाऊस फुल्ल होत गेले. विधिनिषेध चांगले चालले. आम्ही थेटरात आल्यावर नगरचे दोन संगीतज्ञ बाप-लेक भेटले. मुलगा दिलरुबा उत्तम वाजवायचा आणि बाप तबला पेटी वाजवायचा. त्या दोघांनी नाटकांत पार्श्वसंगीताची जोड विनावेतन पण इमानाने दिली. त्यांची नावे आता मला आठवत नाहीत, पण ते मराठे होते. त्यांच्या सहकाराचे ऋण अल्पशः फेडण्यासाठी मुंबई रेडिओवर त्यांचे कार्यक्रम ठेवण्याबद्दल मी विविधवृत्ताचे कै.रामभाऊ तटणीस याना शिफारसपत्र दिले. तेथील कार्यक्रमामुळे त्या बापलेकांना गणेशोत्सवाच्या हंगामात ठिकठिकाणची आमंत्रणे आली नि चांगला पैसा मिळाला, असे त्यांनीच मला धुळे येथे भेटले असता सांगितले.
माझी अब्रू घेणारा दोस्त
माझा १२ हजारांचा छापखाना अवघ्या ९०० रुपयांत विकणारा आणि तेही रुपये कसल्यातरी जुगारात उधळणारा दोस्त कंपनीत आश्रयाला आला होता. नाटके चांगली चालली होती आणि मुथा १० आण्याचा भाग काढून घेऊन ६ आणे व्यवस्थापकाच्या पदरात टाकीत होता. हे दोस्त व्यवस्थापकीय काम पहात होते. एका प्रयोगाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी थेटराच्या आवारात ७-८ छोट्या छोट्या `वाल्यांचा’ कलकलाट ऐकू आला. भाजीवाला, लाकूडवाला, दूधवाला इत्यादी, चौकशी करता कळले की या लोकांची किरकोळ देणी द्यायची होती. मी म्हटले देऊन टाका. दोस्त वदते झाले की जवळ पैसे नाहीत.
मी : अहो, कालच्या नाटकाचा गल्ला आला होता ना ?
तो : होय. पण मी तो वाण्याला देऊन टाकला.
काय नाव द्यावे असल्या व्यवस्थेला? कपडे केले, बाहेर पडलो. श्री. पारखे यांच्याकडून १५ रु. आणले आणि कटकट मिटवली.
उद्या थेटर खाली करा
सुमारे महिनाभर आमचे प्रयोग छान चालले होते. एकाकी मुथाला काय झाले कुणास ठाऊक. तो माझ्याकडे आला नि म्हणाला" तुम्हाला उद्या थेटर खाली करून दिले पाहिजे.
मी : का म्हणून ?
तो : मी इतक्याच मुदतीचे कंत्राट केले होते. मालकाने थेटर दुसऱ्या कंपनीला दिले आहे. माझा नाईलाज आहे.
मी : मग आपल्या कंत्राटाचे काय ?
तो : कसले कंत्राट ?
मी लागलीच आमच्या दोस्त महाशयांना बोलावले आणि कोल्हापूरला जाताना मुथाशी करायला सांगितलेल्या करारनाम्याची मागणी केली. वाकडे थोबाड करून शहाणा म्हणतो "करारनामा केला नाही." छान. मुथाने त्याला जानीदोस्तीच्या थापा मारून बनवले नि करार केलाच नाही. आता मुथाला जोर चढला. प्रसंग तर मोठा बिकट आला.
मी : बरं पण मुथा, आता पुढे काय ?
तो : ते मी काय सांगू ? तुमचे तुम्ही पाहून घ्या. मी मोकळा झालो.
परक्या गावी माझे कुटुंब, मुलंबाळं आणि कंपनीतले २०-२५ लोक यांचे लटांबर, पावसाळा चालू झालेला. नगरला तसा पाऊस कमीच. पुढची काही व्यवहाराची सोय लावण्यापूर्वी बूड तरी टेकायचे कुठे? थेटरच्या मालकाला मुथाने बनवलेच होते. इतक्यात त्याने तेल्यांच्या धर्मशाळेच्या पंचांना चावा घेण्यापूर्वी मी श्री. टिपणिसांना ती जागा मुकर करायला तातडीने पाठवले. ती जागा मिळाली आणि आमचे सारे लटांबर धर्मशाळेत रहायला गेले. आता पुढचा मार्ग कोणता, या विचाराच्या भवती न भवतीने माथे भणाणून गेले..
तरीही मी नाटकांच्या तालमी दररोज चालूच ठेवल्या. या खेपेला मात्र धर्मशाळेच्या व्यवस्थापकाने अधूनमधून त्रास द्यायला सुरुवात केली. त्यावेळी कंपनीत नटाचे कामासाठी दोन स्थानिक देशी-क्रिश्चन तरुण येत असत. एके दिवशी धर्मशाळेचा राखणदार ओरडत आला. " साहेब, तुमच्याकडे येणारी गावची दोन महारड्यांची कारटी खाली नळाला शिवून पाणी पितात. हे आम्हाला चालणार नाही. ते बंद करा." मी म्हटले, "अहो, ते क्रिश्चन आहेत, महार नव्हत."
तो : “किरिस्ताव झाला म्हणून त्यांची जात लपते काय? नगरात यांचाच उकिरडा रगड आहे." यावर काय उत्तर देणार ? एकदा तर सारी पंचमंडळीच मला भेटायला आली. त्यांना धर्मशाळेच्या भाड्याची चिंता. त्यांचे कसेबसे समाधान करून वाटेला लावले. हा सारा मुथाच्याच कानचावणीचा परिणाम लगेच दुसऱ्या दिवशी बेलिफाला घेऊन, मुथाशेट कंपनीवर जप्तीचे वारंट घेऊन हजर. कंपनीकडे माझे इतके रुपये येणे आहेत आणि कंपनी नगरहून निसटण्याच्या बेतात आहे, अशी त्याची तक्रार. हे काय नवीन लचांड ? मी याचे कसले देणे लागतो ? मी श्री. पारखे याचा सल्ला घेतला. माझे चिरपरिचित पुण्याचे स्नेही श्री. गम्पा प्रधान तेथे सरकारी ऑफीसर होते. त्यांनी जामीनकी दिली आणि दुसरे दिवशी मी जाब द्यायला कोर्टात हजर झालो. न्यायमूर्तीना सर्व परिस्थिती सांगितली. पारखे वकिलांनीही मदत केली आणि मी मुक्त झालो.
एक नवखा पाटील, धावण्याला धावला
दोन तीन दिवसांतला चमत्कार. एका सकाळी एक मुंडासेवाला मध्यम वयस्क नवखा पाटील मला भेटायला आला. तो म्हणाला, "साहेब, तुमची नाटकं म्या पाहाली. लइ चांगली, अशा कंपन्यांना बनवायचा या नगरात काही लोकांचा धंदाच आहे. आपला माझ्यावर विश्वास बसत असेल, तर आपल्याला पारनेरला घेऊन जातो नि तेथे काही प्रयोग करून, पुढे देव वाट दाखवील तसे करू. पण आमच्याजवळ पडदे वगैरे सामान काहीच नाही, ही अडचण त्याला सांगितली. सरक-पडद्यांची योजनाही समजावून दिली. त्याने लगोलग कापडाचे गठ्ठे आणून दिले. आमच्या कंपनीतील श्री. कांता राजे (हा हुशार शिंपी नि वाकबगार नट) याने भराभर पडदे शिवले. निरनिराळ्या रंगांसाठी पाटीलने ते उत्तम रंगवून आणले, तारा, दोरे फिरक्या वगैरे सर्व साहित्य तयार केले. कोणत्याही रिकाम्या जागेत बोलबोलता थाटामाटाची रंगभूमी तयार करण्याचे साहित्य तर आमच्या हाती आले आणि हे सारे त्या कनवाळू पाटलाने अगदी मुकाटतोंडी तयार करवून दिले. त्याचप्रमाणे त्याने रोख ५० रुपये घरखर्चासाठी देऊन, फक्त कंपनीतल्या नटवर्गाला पारनेरला नेले.
पारनेरला चारी बाजूनी भिंत असलेली एक ओसाड जागा थेटरसाठी ठरली. आमच्या मंडळींनी हां हां म्हणता तेथे एका बाजूला भर घालून रंगमंच उभा केला. बाकीचा भाग उघदा. विचारले की प्रयोग चालू असताना पाऊस आला तर ? पाटील म्हणाले, "अहो येथे पाऊस फारसा जोरदार पडत नाही. भिरभिर पडला तर तो येथल्या लोकांना चालतो. ते बसतात तसेच नाहीतर घेतात छत्र्या डोक्यावर. पण नाटकाची त्याना हौस फार” बिन्हाडाची सोय दुसरीकडे एका सोयीस्कर बंगल्यात केली. पारनेरलाही काही सुशिक्षित मंडळी, वकील, मामलेदार यांचा पाठिंबा मिळाला. पारनेर गाव आधीच लहान, त्यात नाटकाला उत्पन्न किती होणार ? २५-३० पलीकडे आकडा जाईच ना. तरीही पाटील छातीठोकपणे प्रयोग करीतच होता. ‘खरा ब्राह्मण`, `विधिनिषेध’ आणि ‘काळाचा काळ’ अशी तीन नाटके आम्ही सुमारे पाऊण महिन्यात केली. सगळ्यांनी ती फार आवडली.
आम्हाला लोकांनी अल्पोपहार दिले आणि सत्कारही केले. तेथल्या शाळेत माझे व्याख्यानही झाले. पाटलाने एवढा त्याग केला पण त्याच्या व आमच्या पदरात काहीच पडले नाही. अखेर त्या महात्म्याने आम्हांला परत नगरला धर्मशाळेत आणून सोडले आणि म्हणाला, “साहेब, सगळीकडे पाऊस जोरदार पडत आहे. इतर कुठेही जायची सोय नाही तेव्हा मी आपली आता रजा घेतो. आपली झाली इतकी सेवा मी संतोषाने केली आहे. देव तुम्हांला मार्ग दाखवील, रामराम. या नवख्या कनवाळू पाटलाने कंपनीच्या रंगभूमीच्या सजावटीची इतकी उत्कृष्ट सोय करून दिली की त्या महात्म्याचे आभार मानायला आमच्यापाशी शब्दच नव्हते. पुढे प्रत्येक ठिकाणी ही रंगमंचाची सोय आम्हांला फार उपयोगी पडली. कारण खानदेश वऱ्हाडात थेटरे म्हणून गुरेढोरे बांधण्याच्या बखळी मिळत. पण पडदे वगैरेंची सोय कुठेच नसे. तेथे आम्ही आमची सोय चटकन लावून घेत असू.
आता भरारी मारल्याशिवाय तरणोपायच नाही
असा विचार करून मी धुळ्याला धाव घेतली. तेथे सहानुभूती बाळगणारे अनेक मित्र होते. त्यांनी आपणहून खरा ब्राह्मण नाटकाचे दोन प्रयोग हौशी मंडळींकडून करविले होते. त्याची आश्वासित रॉयल्टी येणे होती. शिवाय, बूड टेकायला तेथे माझे कविमित्र कै. केशवराव खारकर यांच्या दोन चिरंजीवांचे बिऱ्हाड होते. मी जाताच माझ्या हातांत २० रु. रॉयल्टी पडली. लगेच तारेने मी ती रक्कम सौ. च्या नावे नगरला धाडली. इतर काही नसले तरी सगळ्या मंडळींच्या भोजन खर्चाची तरी आबाळ होऊ नये, ही माझी काळीजतोडी विवंचना.
प्रकरण २०
धुळ्याला गेल्यावर तेथील अनेक मराठे मित्र माझ्याभोवती सहाय्यासाठी जमा झाले, हे सगळे श्रमजीवी वर्गातले होते. त्यात काही तर पेहलवानीचा व्यवसाय करणारे होते. उदाहरण द्यायचे तर नथू पारोळेकराचे देता येईल. इतक्या वर्षांचा काळ गेल्याने मी त्यांची नावे विसरलो असलो तरी त्यांच्या प्रतिमा डोळ्यांपुढे तरंगताहेत. पांढरपेशा बुद्धिवंतांपेक्षा या श्रमजीवी दोस्तांनी मला हरतऱ्हेचे साह्य केले. अहमदनगरला अडकलेले माझे सारे कुटुंब आणि कंपनीतील १५-२० मंडळी धुळयाला कशी आणता येतील, हा माझ्यापुढे त्रांगडेवजा प्रश्न होता. त्या अडचणीतून या दोस्तांनीच मला वासे सोडविले ते पहा.
सौ. आईसाहेब भांडारकर
या उदारधी महिला त्यावेळी श्रमजीवींच्या नि अस्पृश्यांच्या पुढारी होत्या. दररोज सकाळ संध्याकाळ त्यांच्या बंगल्याच्या आवारात या लोकांच्या बैठकी होत असत. तेथल्या चर्चेत अनेक प्रश्न सोडवले जात आणि गोरगरिबांच्या आर्थिक अडचणींचा परामर्ष घेतला जात असे. तेथे माझ्या श्रमजीवी मराठी दोस्तांनी माझ्या अडचणींचा प्रश्न काढताच, त्या कनवाळू बाईनी मला भेटायला बोलावले. मी गेलो. सर्व परिस्थिती सांगितली. त्यांनी २-३ दिवसांत मला रोख ३०० रुपयांची रक्कम देऊन, " तुम्ही आपली सर्व मंडळी येथे लवकर आणा आणि खेळाला सुरवात करा, असा आदेश दिला. लगेच मी ७५ रु. नगरला पाठवून प्रथम कुटुंबीय मंडळी पुण्याला आणली आणि स्वतंत्र घर भाडयाने घेऊन तेथे बिऱ्हाड थाटले. विचार केला की यापुढे धुळे हेच मध्यवर्ती वसतीचे ठिकाण ठरवून, दौरे खानदेशभर काढावे. लगेच कंपनीच्या मंडळींनाही धुळ्याला आणले. पण तेथे कंपनीच्या बिऱ्हाडाला जागा कोण देणार? कारण, खरा ब्राह्मणाचा द्वेष तेथेही मनस्वी पेरलेला सगळा ब्राह्मण वर्ग आमच्या विरुद्ध. अखेर सबर्बनमध्ये एक सोयीस्कर रिकामे घर भाड्याने मिळाले. तेथे सोय लावली आणि थेटरची चौकशी करू लागलो.
थेटर देशील तर याद राख
धुळ्याला एकच ‘थेटर’ नावाचे ठिकाण होते, त्याचा मालक होता मारवाडी. भटांनी त्याला दम भरला. त्याने चक्क नकार दिला. आली का मोकांड! प्रयोगांना थेटर नाही नि दोन छावण्यांतला भोजन खर्च चालूच राहिला. खूप भवति नि भवति केल्यावर ज्या गावी थेटर मिळेल एका प्रयोगापुरते का होईना तेथे कंपनीने जावे नि खेळ लावावे, असे ठरले. त्याप्रमाणे अमळनेर येथे रिकामे मिळाले आणि ‘खरा ब्राह्मण’च्या एकाच प्रयोगासाठी तिकडे कंपनी घेऊन गेलो. प्रवास बसचा होता. त्यावेळी संबंध खानदेशात
ट्रॅवलिंग (फिरते) सिनेमांचे खूळ
बरेच माजले होते, त्यांची ती बिजलीची रोषनाई, लाऊड स्पीकरवर लागणारी गाणी आणि सिनेमा, यामुळे सगळा खेडूत आणि स्थानिक लोकांचा घोळका तिकडे आकर्षिला जायचा. नाटकांना विचारतो कोण ? आम्ही अमळनेरला पाऊल ठेवतो तोच तेथे जवळच फिरत्या सिनेमाचा भोंगाडा चालू झाला. आमच्या जाहिरातीची करामत लंगडी पडली. तरीही आम्ही नाटकाचा प्रयोग केला. उत्पन्न रु. ५०-६० झाले. थेटरवाल्याने भाडे माफ केले आणि आम्ही गाशा गुंडाळून धुळ्याला परत आलो. येताना बसमध्ये एका गृहस्थाची भेट झाली. थेटरचा प्रश्न निघाला. " काय ? तो मारवाडी थेटर देत नाही तुम्हाला ? चला मी देतो मिळवून. असे तो म्हणाला. या गृहस्थाचे चिरंजीव धुळ्याला वकील होते. २-३ दिवसांत त्याने मला आपल्या घरी जेवायला बोलावले आणि त्याच वेळी त्या मारवाड्याला बोलावणे पाठविले. तो आला. त्याचे स्वागत या गृहस्थाने चक्क शिव्यागाळीने केले. तो भेदरला. "येथल्या भटांच्या नादाला लागलास काय ? ठाकऱ्यांना ताबडतोब थेटर दे, नाहीतर तुझी ती (?) भानगड चव्हाट्यावर मांडून पळता भुई थोडी करीन, समजलास? " त्याने "थेटर देतो" असे मला आश्वासन देऊन, ताबा घ्यायला थेटरवर बोलावले. कंपनीतल्या मंडळींनी ताबा घेतला. बिऱ्हाडही तेथेच आणले. थेटराचे वर्णन काय सांगावे? निताटल्याला मसण गोड, अशी अवस्था. गुराढोरांची खानदेशी बखळच ती. स्टेजवर ढोपर ढोपर माती, बिऱ्हाडाच्या जागी घुशींची बिले. मंडळींनी कष्टाची शिकस्ता करून थेटर उपयोगी पडेल इतके बनवले. खुर्च्या बाके हाटेलांतून भाड्याने आणायची. प्रकाशासाठी पेट्रोमॅक्स दिवे भाड्याने आणायचे आणि सगळ्यांना फुकट पासांची पुडकी (थेटरमालकासगट) वरदक्षणा म्हणून द्यायची. थेटरमालक तर बोलून चालून जातीचा मारवाडी. ती तर आमची तिकीटविक्री चालू झाली, का लांब दूर नाक्यावर बसून, त्याला मिळालेली तिकीटे कमी दराने विकायचा. "
त्यावेळी धुळ्याला श्री. भिडे आय. सी. एस. कलेक्टर होते. मी त्यांना भेटलो. सज्जन माणूस. त्यांनी लागेल ती मदत द्यायचे कबूल केले. तिकीटविक्रीवरचा टॅक्स म्हणून १००-१५० रुपये सरकारी कचेरीत आगाऊ डिपॉझिट भरावे लागत. भिडे साहेबांनी सवलत दिली. तिकीट विक्री चालू झाली का तेथे एक कारकून येऊन बसायचा आणि विक्रीप्रमाणे हिशोब करून टॅक्स घेऊन जायचा. डिपॉझिट वगैरे काही नाही.
हे सारे होत असताना, बामण मंडळींनी स्वयंसेवकांच्या टोळ्या बनवल्या. नाक्यानाक्यावर लोकांना अडवून, या खेळाला जाऊ नका, असा हट्ट धरायचे. बामण मंडळींनी तर बहिष्कारच घातला होता. बामणेतर मंडळी मात्र भटी हट्टाग्रहाला धुडकावून नाटकांना यायची. `खरा ब्राह्मण आणि काळाचा काळ ` ही दोन नाटके छान चालली. मात्र ‘विधिनिषेध’ उत्पन्नाला कमजोर. भिडे साहेब मात्र प्रत्येक नाटकाला अगत्याने यायचे. " इतकी चांगली भारदस्त नाटके असूनही, या भटांना इतके चवताळायाला काय झाले, कुणास ठाऊक", असे ते म्हणायचे. महिनाभर प्रयोग झाल्यावर, मारवाडी उलटला आणि थेटर दुसऱ्या एका कंपनीला दिले आहे, सबब लवकर खाली करा, असा हेका धरून बसला. आली पुन्हा मोकांड, भिडे साहेबांच्या कानावर हे घालताच, ते म्हणाले " हे पहा ठाकरे, पाटाजवळचे एक सिनेमा थेटर ओस पडले आहे नि ते सरकारच्या ताब्यात आहे. म्हणत असाल तर ते आता खुले करून देतो. झाडून साफही करून देतो. मात्र तुम्हाला बैठकीची व्यवस्था बदलता येणार नाही. बोला," मी "ठीक आहे. नाटके अशाच थाटाच्या बैठकीने व्हावी, असे माझे मत आहे. प्रयोग येऊन तर पहा." `कंपनी पुन्हा जुन्या जागेत बिऱ्हाडाला गेली. सिनेमा थेटरात रंगमंचाची जागा अगदीच निमूळती. पण तेथेही आम्ही पडदे ठाकठीक लावून, `काळाचा काळ ` नाटक केले. उत्पन्न बरे झाले. दूर उंचावर गॅलरीत बसून नाटक छान अनुभवता येते. सगळ्यांचा अभिप्राय पडला. तेथे ३-४ प्रयोग केले, भिडे साहेबांचा जोरदार पाठिंबा पाहून, भटी बहिष्काराची नांगी मोडली आणि अनेक शिष्ठ मंडळी नाटके पहायला येऊ लागली.
काहीही झाले तरी कंपनीचा मुक्काम एकाच ठिकाणी डांबून चालणारे नव्हते. पाऊस संपत आला होता. तेव्हा खानदेशात इतरत्र कंपनी फिरवावी, आणि माझ्या कुटूंबाला धुळ्यालाच ठेवावे, असा बेत ठरला. कारण, येथे कौटुंबिक जीवनाला स्थैर्य लाभले होते. शिवाय, खारकर बंधू नि त्यांची कर्तबगार वृद्ध मातोश्री कुटुंबाचे क्षेमकुशल पहाण्यास खबरदार होते.
पारोळे येथील भयंकर दंगा
आम्ही खानदेशात पाऊल टाकण्यापूर्वी अंदाजे एक वर्ष पारोळे येथे इतका भयंकर हिंदू मुसलमानांचा दंगा झाला होता की त्याचे सादपडसाद, केवळ भारताच्या नव्हे तर सगळ्या जगाच्या कानाकोपऱ्यात झंजावातासारखे घुमत होते. जुन्या पठडीच्या हिंदू बायका नवऱ्याने नाव घ्यायला जशा लाजत असत. त्याच थाटाने एका जमातीने दुसऱ्या जमातीवर हल्ला केला. अशा बुरखेबाज भाषेला त्याकाळी राजमान्यता लाभलेली नव्हती. ब्रिटिश अमदानी होती तेव्हा. पारोळ्याला दंग्याचा पाडाव करताना तेथल्या हिंदू आबालवृद्धांनी दाखविलेल्या शौर्याच्या नवलकथा ज्याच्या त्याच्या तोंडून ऐकू येत असत. सध्या तर तेथे मुसलमानांवर कड़क बहिष्कार टाकला गेला होता. गावात त्यांना दाणागोटा मिळायचा नाही. विहिरीवर पाणी मिळायचे नाही. बसगाड्यांत त्यांना चढू द्यायचे नाहीत. तेथे चिमाशेट (किंवा चिंगाशेट) नावाचे एक वृद्धत्वाकडे कललेले व्यापारी होते. ते या चळवळीचे एकमुखी नेतृत्व करीत होते. चिमाशेटचा शब्द उभ्या पारोळ्यात बिनशर्त शिरसामान्य ! साध्या रहाणीचा हा गृहस्थ तमाम हिंदू जनतेला एकवटणीच्या पोलादी चौकटीत ठाकठीक जाम बसवू शकलाच कसा, याचे ज्याला त्याला नवल वाटायचे. कंपनीतर्फे आमचे टिपणीस शेटजींना भेटताच, खुशाल घेऊन या तुमची नाटक मंडळी पारोळ्याला, आम्ही तुमचे स्वागतच करू, असे त्यांनी आश्वासन दिले आणि आम्ही पारोळ्याला मुक्काम ठोकला. तेथे एक चांगले थेटरही होते. बिऱ्हाडालाही जागा मिळाली. पहिल्याच प्रयोगाची तिकीट विक्री चालू होताच, शेटजींचा निरोप आला की ‘मुसलमानांना तिकिटे विकायची नाहीत.` हा भेद आम्ही कसा ओळखणार ? मी विचारले. त्यावर त्याची काळजी नको. तो बंदोबस्त आमचे स्वयंसेवक दरवाजावर उभे राहून चोख बजावतील. आमचा दीड महिन्याचा पारोळ्याचा मुक्काम छान गेला. प्राप्तीही बरी झाली. रोज सकाळ संध्याकाळ चिमाशेटजी बिऱ्हाडी येऊन काय हवं नको याची जातीने चौकशी करायचे, नंतर आम्हाला
चोपड्याची आमंत्रणे येऊ लागली
इतकेच काय, पण कंपनीला तेथे नेऊन पोचविणाऱ्या वाहनांची मोफत सोयही तेथल्या लोकांनी केली आणि आम्ही चोपडे येथे मुक्काम ठोकला. गावाबाहेर बांबूच्या तट्टयाचे प्रशस्त थेटर आणि त्याला लागूनच नदीच्या काठावरचे भक्कम बांधणीचे घर बिऱ्हाडाला.
शेजारीच दोनतीन देवळे होती. नदीला फारसे पाणी नव्हते. उगाच पाऊल बुडायचे बाकी सारी वाळू येथे येताच खानदेशी हिवाळ्याचा नि जोरदार वावटळीचा हंगाम झाला. प्रयोग जाहीर करावा नि संध्याकाळ होताच जोरदार वावटळीचे तुफान इतके व्हायचे की माणसे घराबाहेर पडण्याची मुष्किल तर गावाबाहेर नदीच्या काठाकडे येतो कोण? लोक म्हणायचे अहो आम्हाला नाटके पहाण्याची खूप हौस आहे. पण या तुफानापुढे करायचे काय? अशाही अवस्थेत देवावर हवाला ठेवून, आम्ही ७-८ प्रयोग केले. उत्पन्न पोटापुरते व्हायचे. पण चोपड्याची कोंडी कशीतरी सोडविलीच पाहिजे, याचा विचार चालू झाला. पण जायचे कुठे ? इतक्यात थेटरचे मालकच आले नि म्हणाले, "फैजपूरला छावणी असलेल्या एका फिरत्या सिनेमाला मी थेटर कबूल केले आहे. ते लोक येथे येतील, तुम्ही फैजपूरला जावे हे बरे. " सिनेमाचा मालकही मला समक्ष भेटला. मी इकडे येतो. तुम्ही जा. म्हणाला ठीक म्हणून आम्ही फैजपूरला आमचा माणूस पाठवून व्यवस्था केली.
अरे, कंपनी आली रे आली
" बखळीतली सगळी गुरंढोरं बाहेर काढा नि शेतावर बांधा, त्यांना लवकर जागा मोकळी करून या. "थेटरच्या मालकांचा नोकरांना हुकूम सुटला. जागा प्रशस्त. थेटर का म्हणायचे? तर एक लांबरुंद खड्डा खणलेला होता. आम्ही रंगमंचाची आणि बिऱ्हाडाची सोय लावून घेतली. संध्याकाळ होताच पहातो तो थोड्याच अंतरावर फिरत्या सिनेमाचा रेकार्डचा भोंगाडा जोरदार चालू! अरेच्या, हा लेकाचा अजून इथेच? चोपड्याची नुसती थापच मारली वाटतं यानं! टिपणिसांना मी चौकशीसाठी पाठवले. लेकाचा म्हणतो काय, “अहो. पंचक्रोशीतून लोकांच्या गाड्याच्या गाड्या रोज येताहेत, मग येथले उत्पन्न टाकून दुसरीकडेच जाऊच कशाला? "म्हणजे, ही फिरत्या सिनेमाची साडेसाती अखेर आम्हांला भोवणार. टिपणीस-" बुधवार, शनिवारी तरी सिनेमा बंद ठेवाल का? आठवड्यातून दोन दिवस आम्हांला काही कमावता येईल. "तो" असंकसं करून चालेल? आमचा कार्यक्रम रोजचाच असतो.
फैजपूर गाव लहानसे टुमदार, येथले लोकही सुखवस्तू व्यापारी पेशाचे धागेदोरे थेट मुंबईला भिडलेले. परस्थांच्या आगतस्वागतात आनंद मानणारे. येथे आल्यावर एक मोठा लाभ झाला असेल तर तो कै. तोताराम बंधू महाजन या तीन बंधूंच्या एकत्र कुटुंबीय जिव्हाळ्याचा नि सक्रीय पाठिंब्याचा. तोताराम ऊर्फ नाना महाजन चांगले शिकलेले. मनाचा सच्चा आदमी. ग्रामस्थ अधिकारी, सगळ्या गावावर दांडगा वचक, थोरले बंधू व्यापार उदिमाचा व्यवहार पहायचे. नाना सार्वजनिक उलाढाल्यात खपायचे. त्यांनी आम्हांला सर्वतोपरी मदत केली. अडीअडचणीच्या वेळी जातीने येऊन सोडवणूक करायचे. महाजन कुटुंबातील एकूणएक व्यक्तीचा नि ठाकरे मंडळींचा ऋणानुबंध आजवर टिकलेला आहे.
फैजपूरला तालुक्याचे ठिकाण यायल. प्रयोगांची परवानगी तेथल्याच कचेरीतून काढावी लागे. त्यावेळी तेथे श्री. मिरजकर हे सबजज्ज होते. हे प्रबोधनचे नि माझे अभिमानी. ते लगेच मला येऊन भेटले. त्यांच्यामुळे यावलचा सारा वकीलवर्ग डेक्कन स्पार्क्सचा चहाता बनला. ती मंडळीही अधून मधून नाटकाला यायची. रंगमंचावरची सरक पडद्यांची व्यवस्था पाहून खुष व्हायची.
आमचे बुधवार, शनिवार, रविवारचे प्रयोग चालूच होते. सिनेमाच्या साडेसातीमुळे उत्पन्न बेतास बात होत असे. तरी फैजपूरचे आमचे जीवन सुखात चालले होते.
टाकलेल्या पोराचा पराक्रम
फैजपूरला चालू असलेल्या नाटकांखेरीज, मी आणखी एक टाकलेले पोर नावाचे कर्णचरित्रावर चौथे नाटक तालमी घेऊन वठवीत होतो. मात्र त्याचे दोनच अंक तयार होते. शेवटचा तिसरा अंक लिहायचा होता. एक दिवस यावलची काही वकील मंडळी. रविवारची सुट्टी असल्यामुळे, दुपारचीच कंपनीत आली. त्यावेळी आमच्या नव्या नाटकाच्या तालमी चालल्या होत्या. त्या पहाताच "या नाटकाची रंगीत तालीम होऊ द्या की एके रात्री फारच आकर्षक नाटक आहे." असा त्यांचा अभिप्राय पडला.
एका शनिवारी रात्री आम्ही ‘टाकलेले पोर’ नाटक जाहीर केले. यावलहून सारे वकिलादी मोठेमोठे अधिकारी नाटकाला यायचे आहेत, ही भुमका पसरल्यामुळे, इतरेजनही पुष्कळ आले. महिलावर्गही खूपच आला. नाटकही खूपच रंगले. कित्येक प्रवेशांत तर काही महिला डोळे पुशीत फुंदत होत्या, दोनच अंक नि दोनच तास. पण सारा प्रेक्षक शहारून गेला.
प्रयोग संपला. आम्ही पडदे सरकवले आणि यावलकर श्रेष्ठींना आणि स्थानिक पुरस्कर्त्यांना चहापाण्यासाठी रंगमंचावर आसनस्थ केले.
गप्पाटप्पा चालू झाल्या. लोक सारे घरोघर गेले, तरी २०-२५ मंडळी थेटरबाहेर बरीच कुजबूज करीत असल्याचे आढळून आले. विशेषतः फैजपूरचे नि यावलचे फौजदार त्यात भाग घेत होते. आम्ही तिकडे फारसे लक्ष दिले नाही. इतक्यात फौजदार येऊन, त्यांनी १-२ वकिलाना बाहेर बोलावले. थोड्याच वेळात आणखीही काही वकील व इतर श्रेष्ठी एकामागून एक बाहेर गेले. तेथे काही वेळ बरीच बोलणी झाल्यावर, यावलकर सगळी मंडळी ट्रकमध्ये बसून निघून गेली.
यावलला नवेच नाटक रंगले
दुसऱ्या दिवशी रविवारी २ च्या सुमाराला स्नेही महाशय मिरजकर, मुन्सफ यांचेकडून निरोप घेऊन एक गाडीही आली. दादासाहेब ठाकरे यांना मिरजकर साहेबांनी आत्ताच्या आता यावलला बोलावले आहे असा तो निरोप. काय प्रकरण आहे याचा मला बोधच होईना. गाडीत बसून मी आणि टिपणीस यावलला गेलो. गाडी एका बंगल्याच्या दारात उभी राहिली. पहातो तो दारावर केळीचे खांब उभे केलेले. सगळी वकिलादी मंडळी जामानिमा केलेली स्वागताला आली. माझ्या नवलाचा पारा एकेक बिंदू वरवर सरकत चालला. आत गेलो. तक्केलोड बैठका दिसल्या. एक खास आसन केले होते. तेथे मिरजकर मला घेऊन गेले नि बसा इथं म्हणाले.
मी : एकट्या माझ्यासाठी हे खास आसन कां ?
मिरजकर : आधी बसा, खुलासा होईलच, त्या आसनाशेजारी मसुराश्रमाचे ब्र. श्री. वामनमूर्ती बसले होते. ` बोलवा त्या वर-वधूला आता. ` इतक्यात एक नवपरिणित जोडपे आले नि त्यांनी माझे पायांवर मस्तके ठेवून समोर उभे राहिले. अजूनही मी अचंब्याच्या बुचकाळ्यातच. मिरजकर उठले नि बोलू लागले
"केशवरावजी, आजचा हा विवाहाचा मंगल प्रसंग तुमच्या काल रात्रीच्या` टाकलेले पोर ` नाटकाचे प्रयोगाने घडवून आणला आहे. वर-वधू फैजपूर येथील भावसार जातीची. दोघांचे प्रेम जमले. मुलीला काही दिवसही गेले. गावात कुजबूज चालू झाली. जातवाले आईबापाच्या नावाने निंदा करू लागले, अशा मुलीला लग्नात कोण पत्करणार? आधी तिला घराबाहेर हुसकावून द्या. नाहीतर जातीवेगळे पडा. अशा वेळी या तरुणाने धिटाईने पुढे येऊन सांगितले की माझे हिच्यावर प्रेम आहे आणि तिच्या गर्भारपणाला जबाबदार मी आहे. तेव्हा हिच्याशी माझे लग्न लावून द्या, फैजपूरला मुसलमानांची वसती बरीच आहे. त्यातल्या एक पोऱ्या सांगू लागला की, "नहि नहि, वो तो मेरी कमाई है. हम ले जायेंगे यह औरतको." अखेर भावारांची पंचायत भरली आणि त्यांनी "मुलीला घराबाहेर हुसकावून द्यावी असा एकमुखी निकाल दिला.” मुलीला आईबापांनी घराबाहेर काढले. मुसलमान घिरट्या घालू लागले. या तरुणाने छाती करून तिला आपल्या घरी नेले. "जातवाल्यांना म्हणाव, खुशाल आमच्या घराला वाळीत टाका मी हिचा त्याग करणार नाही." असा पुकारा केला.
पंचमंडळी निकाल देऊन विरंगुळ्यासाठी टाकलेले पोर नाटक पहायला आली आणि कर्णकुंतीचे संवाद ऐकताच प्रत्येक पंच मनोमन भांबावून गेला, आज आपण फार मोठी घोडचूक केली, याची रुखरुख त्यांच्या मनाला क्षणोक्षणी डाचू बोचू लागली. नाटक संपताच पंचमंडळी फौजदारांना भेटली नि सारी हकिकत त्यांना सांगितली. त्यांनी या वर-वधूला थेटरवर बोलावून आणली आणि वकिलांचा सल्ला घेऊन, त्यांना आमच्या बरोबर यावलला रवाना केले. आम्ही रात्रीच्या रात्रीत सगळी तयारी करून, आज सकाळी ब्रह्मचारी वामनमूर्तीच्या हस्ते या जोडप्याचा वैदिक पद्धतीने विवाह साजरा केला आणि तुम्हाला आशीर्वाद द्यायला निमंत्रित केले. हा सारा तुमच्या ` टाकलेले पोर `प्रयोगाचा जयजयकारच म्हटला पाहिजे. "
नंतर पानसुपारी चहापाणी झाल्यावर हा मंगल योगायोग पुरा झाला नि मी फैजपूरला परत आलो. सुमारे पंधरवडाभर प्रयोग करून कंपनीचा मुक्काम हलविण्याचे ठरले. स्नेही महाशय नाना महाजन यांनी जळगावला जावे असे सांगितले. इतकेच नव्हे तर तेथे त्यांचा एक मोठा विस्तृत बंगला होता त्याचा सारा तळमजला आम्हांला बिऱ्हाडासाठी मोफत दिला. आम्ही जळगावला आलो.
तेथेही थेटरची नकारी अडचण!
भटांना कावीळ झाली का मारवाड्यांचे डोळे पिवळे का होतात. हे कोडे मला अजूनही सुटत नाही. जळगावला एक सुंदर बांधणीचे थेटर आहे. त्याचा मालक मारवाडी. आम्ही खरा ब्राह्मण वाले नाटक कंपनी म्हणून त्याने आम्हांला, थेटर मोकळे असतानाही, स्पष्ट नकार दिला. आता?
आता काय? कै. चित्रे वकील यांचा भरपूर सहानुभूतीचा नि सक्रीय सहाय्याचा पाठिंबा मिळाला, "अहो, थेटर मिळेपर्यंत सध्या तुम्ही उत्तम देखाव्याचे फ्लैट्स तयार करा. त्यांनी लगोलग या कामासाठी लागणारे कापड, लाकूड, रंग वगैरे साहित्याची सोय लावली. सुतारही कामाला लावला. मग काय हो, अस्मादिकाच्या अंगातला चित्रकार जागा झाला. दररोज सकाळी ३ तास नि सायंकाळी ३ तास काम करून मी एक दोन देखावे तयार केले. सुमारे महिनाभर आम्ही रंगमंचाची शोभा वाढविण्याचे भरपूर काम केले. इतक्यात भुसावळचे स्नेही दि. ब. डोंगरसिंग पाटील यांचा निरोप आला." भुसावळचे थेटर मी एंगेज केले आहे. ताबडतोब मुक्कामाला इकडे निघून या." चित्रे वकील काय किंवा दि. ब. डोंगरसिंग पाटील काय, दोघेही प्रबोधनाच्या वेळेपासून माझे स्नेही. शिवाय बामणेतरी चळवळीच्या माझ्या दौऱ्याच्या वेळी या दोघांनी ठिकठिकाणी माझी व्याख्याने केली होती.
काही महत्त्वाच्या घटना
जळगावचा मुक्काम हालवून भुसावळला जाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या घटनांचा येथे समाचार घ्यायचा आहे. तो माझ्या आठवणीतही नव्हता. पण नुकतेच मी माझ्या जुन्या चिकटबुकांची दप्तरे बाहेर काढून अभ्यासली, त्यात कितीतरी गोष्टी नवलाईच्या आढळल्या. त्यांचा थोडक्यात वाचकांना परिचय करून देत आहे. धुळ्याला मुक्काम ठोकून मी बसलो होतो. व्यवस्थापक मंडळी थेटर-शोधनात गढलेली. पण माझा लेखन वाचनाचा सपाटा चालूच होता. गावोगाव हौशी मंडळी ‘खरा ब्राह्मण` चे प्रयोग अनेक उत्सवांच्या निमित्ताने करीत असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांत येत होत्या आणि त्या त्या ठिकाणच्या कार्यकारी लोकांच्या पत्रव्यवहाराला नि तक्रारींना मी उत्तरे देत होतो.
बेळगावला पुण्याने चावा घेतला
बेळगाव येथील सहकार्य संगीत नाट्यसमाजातर्फे खरा ब्राह्मणच्या प्रयोगासाठी परवानगी मागण्यासाठी सिटी मैजिस्ट्रेटकडे अर्ज केला. लगेच वर्णाश्रम स्वराज्य संघाचे अध्यक्ष नगरकर वकील यांनी तक्रारअर्ज दाखल करून, प्रयोगाला परवानगी देऊ नये अशी जोरदार मागणी केली. अनेक पुणेरी छापाच्या तक्रारींबरोबरच "पुण्याच्या अधिकारी वर्गाने बंदीही केली होती, अशी थापही मिसळली होती. सिटी मजिस्ट्रेटने पुण्याचे कागदपत्र मागवले," हे नाटक मी ३ वेळा वाचले नि पाहिलेही. त्यात आक्षेपार्ह मला काही आढळले नाही. दिलेली परवानगी मी कदापि मागे घेणार नाही" असा पुणे सिटी मैजिस्ट्रेटचा अभिप्राय मिळाला. बेळगाव सिटी मैजिस्ट्रेटने दोन्ही पक्षांच्या कमिट्या नेमल्या. फुकटात प्रयोगही पाहिला. कुठेच काही सापडेना. मग उरला आक्षेप ‘मारवाडी’ शब्दावर. माझ्याकडे धुळ्याला पत्रोपत्री नि तारातारी चालूच होती. तो शब्दच गाळून प्रयोग करावा. असे मी सुचविले आणि प्रयोगाला परवानगी मिळून, त्याचे लागोपाठ ४-५ प्रयोग हाऊस फुल्ल झाले. ज्ञानप्रकाश नि तेथल्या स्थानिक वृत्तपत्रांत अनेक कालमी लेख आले. दि. २५ सप्टेंबर १९३४ च्या राष्ट्रवीर साप्ताहिकाने तर
आमचा तो बाब्या
मथळ्याच्या एका लेखाने तक्रारखोरांची चांगलीच जिरवली. वासुदेव रंगनाथ शिरवळकर लिखित संतचरित्रात्मक नाटके शाहूनगरवासी करीत असे. त्यावेळी त्यांनी ‘एकनाथ’ नाटकही केले होते. त्याला टिळकांनी नि त्यांच्या महिरापीतल्या भोरप्यांनी अगदी डोक्यावर घेऊन भक्तिरसाने परिपूर्ण म्हणून नाचवले होते. त्या नाटकातील एकनाथाला भटांनी , दिलेल्या अर्वाच्या अश्लील शिव्यांचे उतारेच्या उतारे देऊन लेखकाने स्तुतिपाठकांची खरपूस भंबेरी उडवली.
कोल्हापूरच्या हौशी महार मंडळींनी केलेला ‘खरा ब्राह्मणचा प्रयोग पाहून निर्भीड - कार अनंतराव गद्रे तर एवढे खुष झाले की त्यांनी निर्भीडच्या अंकात त्यावर एक मोठा अभिनंदनाचा लेखच लिहिला. त्यांच्याच शिफारशीवरून कै. वीर सावरकरांनी त्या हौशी मंडळीना रत्नागिरीला बोलावून पतितपावन मंदिरात खरा ब्राह्मणचा रंगदार प्रयोग केला. याशिवाय, महाळुगे (पडवळ) पेटा आंबेगाव, जि. पुणे. सारख्या अनेक खेडेगावांतही लोक प्रयोग करीत होते, त्यांचे अहवाल नित्यशः ज्ञानप्रकाशात प्रसिद्ध होत होते. जव्हार संस्थानादी ठिकाणीही प्रयोग झाले. परवानगी रसवानगीची पर्वा कोणीच केली नाही. ठाकरे आपले आहेत, ठोका प्रयोग, हा खाक्या. अमरावतीलाही अनेक प्रयोग दणक्यात झाले. सारांश, आमची डेक्कन स्पार्क्स स्वस्थ बसली होती, तरी खरा ब्राह्मण अनेक ठिकाणी गर्जतच होता.
एक भलतीच भानगड
धुळयात असताना महाराष्ट्रीय नाटकाविषयी मी अनेक लेखमाला अनेक वृत्तपत्रांत लिहिल्या. ज्ञानप्रकाशात तर ७ लेखांत प्रसिद्ध झाले. इतक्यात जळगावच्या ` वार्ताविहार ` (१-१-३५) शास्त्री की कसाई ?" या मथळ्याखाली एक भयंकर बातमी वाचायला मिळाली. "एका सुविद्य वृद्ध-
विधवेच्या प्रेताचे केशवपन
करण्यात आले." का ? तर म्हणे ते केल्याशिवाय जळगावची भटभिक्षुके प्रेताला मंत्राग्नी द्यायला तयार नव्हती. `वार्ताविहार` म्हणतो, "हिंदी चित्रपट केलेचे प्रथितयशप्रणेते श्री पुडीराज गोविंद फाळके (ब्राह्मण) यांच्या वृद्ध वहिनी गिरिजाबाई फाळके (वय वर्षे ७०) यांना गेल्या महिन्याच्या २७ वे तारखेस जळगाव येथे देवाज्ञा झाली. त्या गतभर्तृका होत्या. त्यांचे पति कै. शिवराम गोविंद फाळके हे १२ वर्षांपूर्वीच कैलासवासी झालेले होते. गिरिजाबाई ह्या सकेशा विधवा म्हणून मृत्यूकालपर्यंत वावरत होत्या. कै. गिरिजाबाईचे चिरंजीव श्री. सदाशिव शिवराम फाळके बी.ए. (ऑनर्स). एल. बी.पी. (लंडन), बी. टी. हे विद्वान गृहस्थ होते. ते जळगावीच रहातात. गिरिजाबाईचे देहवसान झाल्यानंतर त्यांच्या प्रेतास अग्निसंस्कार करण्यापूर्वी सर्व विद्वानांच्या सर्व सुशिक्षितांच्या सर्व सुधारकांच्या, खुद्द गिरिजाबाईच्या बी. ए. एल. बी. पी. बी. टी. झालेल्या चिरंजीवांच्या समक्ष डोळ्यादेखत काष्ठवत ताठ होऊन, पडलेल्या त्या माऊलीच्या प्रेताचे चौफेर चरचरचर केशवपन झाल्यानंतर मग दहन संस्कार झाला. "
यावर वार्ताविहार भिक्षुकशाहीच्या अमानुष करणीवर निषेधाचे कडाडून टोले हाणले. ह्या वेळी श्री. धुंडीराज फाळके कोल्हापूर सिनेटोनच्या काही कामासाठी कोल्हापूरला गेले होते. त्यांना त्यांच्या वहिनीच्या मृत्यूची तार मिळताच ते तडक निघून नाशिकला आले. तेथे त्यांचे पुतणे भेटले. आपल्या ७० वर्षे वयाच्या वहिनीच्या प्रेताचे केशवपन केल्याचे ऐकताच, त्यांचा शोक नि संताप अनावर झाला. त्यांनी शंकराचार्य डॉ. कुर्तकोटींना हकिकत सांगितली आणि जळगावच्या भिक्षुक लोकांच्या निषेधाचा त्यांचा खलिता प्रसिद्ध केला. याशिवाय, श्री. दादासाहेब फाळके यांनीही एक पत्रक काढले. त्यात अनेक मुद्दे असले तरी एक महत्त्वाचा असा होता "
ज्या भटजींनी हे अमानुष कृत्य केले ते आज जवळजवळ पाच-सात वर्षे आमच्या घरी हव्यकव्य करीत आहेत. माझी वृद्ध सकेशा वहिनी राजरोसपणे घरात स्वयंपाकपाणी करीत असता, पाच पंचवीस वेळा घृतकल्या मधुकल्या झोडण्यास आमचेकडे आलेले आहेत.
खाल्ल्या अन्नाची नि दिल्या दानाची लाजलज्जा नाही. तिलाच भिक्षुकशाही म्हणतात. मी हे वृत्त वाचताच मनस्वी संतापलो जात्याच मी भिक्षुकशाहीविध्वंसक व्रताचा ! तडाड उचलली लेखणी आणि खरा दोषी कोण ? मथळ्याचा एक लेख पाठवून वार्ताविहारकडे. तो दि. ३-१-३५ च्या अंकात प्रसिद्ध झाला.
"दादासाहेब फाळक्यांनी भिक्षुकशाहीच्या पाशवी मनोवृत्तीवरच हल्ला चढवून, आपल्या संतापाच्या वेदना शमविलेल्या दिसतात. पण या प्रकारातला मुख्य दोषी कोण? त्याला मात्र सहानुभूतीच्या पडद्यामागे त्यांनी दडवून ठेवण्यात निस्पृहतेशी खास दगलबाजी केली आहे. याची त्यांना आणि त्यांच्या निषेधाची री ओढणाऱ्या वृत्तपत्रकारांना दाद नसावीसे दिसते ... प्राणोत्क्रमण झालेल्या वृद्ध मातोश्रीचे प्रेत स्मशानात नेऊन जाळून भस्म करण्यापलीकडे विशेष काय कर्तव्य राहिलेले होते? प्रेतवाहनासाठी मित्रमंडळीही जमली होती. त्यानी केशवपनाचा हट्ट तर नव्हता ना धरला? भटांप्रमाणे त्यांनीही धरला असता, तरीसुद्धा सदाशिवरावांना त्यांची पर्वा करण्याचे कारण नव्हते. मातेचे प्रेत खुशाल भाड्याच्या बैलगाडीत स्वतः घालून स्मशानात नेता आले असते. केशवपन न कराल तर घरातून प्रेत हलवू देणार नाही अशी पोलिसी सक्ती करायला तरी भटांना तोंड होते का? मुळीच नाही. मग सदाशिवरावांसारख्या सुविद्य म्हणून मिरवणाऱ्या लंडनपंडिताने या अत्याचाराला संमती का आणि दिलीच कशी? अर्थात या कामी मनाचे क्षुद्र दौर्बल्य दाखविण्यातच या सर्व पापाची जबाबदारी श्री. सदाशिवराव फाळके यांच्यावरच येऊन पडत आहे. लंडन युरोपच्या वाऱ्या केल्या. टोपलीमर पदव्या मिळवल्या, तरी अखेर बेटा हिंदू रे बिलकूल हिंदूच... नाशिकच्या कार्ट्याच्या हातून तंत्र मंत्रादी विधी झाल्याशिवाय माझी आई मोक्षाला जाणे शक्यच नाही. एवढीच ज्या बावळटाची कलपना आणि कृती त्याच्या आत्मविश्वासाची किंमत किती कवड्या ठरवायची, हाच वास्तविक महत्त्वाचा प्रश्न आहे. भिक्षुकशाहीचा निषेध करण्यापेक्षा तिला शरण जाणाऱ्या लोलंगताचाच जाहीर धिःकार होणे अगत्याचे आहे. " (धुळे २०-१-३४).
“वाचायचे असेल तर वाचा ...
नाहीतर मरा." मराठी शाळेत असताना, एक मास्तर नेहमी हा मंत्र आम्हांला सांगायचे. त्याचा अर्थ मात्र त्यावेळी आम्हा पोरांना कितीसा समजत असे कोणाला ठाऊक. पण वाढत्या शिक्षणाबरोबर तो नीट उमगू लागला. वाचायचे म्हणजे नीट जीवन जगायचे असेल तर अखंड वाचत जा. तेव्हापासून माझा वाचण्याचा नाद विशेष वाढला. साहजिकच ग्रंथसंग्रहही इतका वाढत गेला की मी कोठेही गेलो तरी गाडाभर ग्रंथ माझ्याबरोबर असायचेच, त्यांची जपणूक हा एक अखंड विवंचनेचा मामला असे. नाट्यव्यवसायानिमित्त गावोगाव भटकंती चालू असताना माझे लेखनही चालूच असायचे. कोठे काही अन्याय दिसला रे दिसला का त्यावर माझा लेख गेलाच एखाद्या वृत्तपत्रात छापायला. कधी कधी जाहीर व्याख्यानातूनही मी त्याचा स्फोट करायचा. अन्याय मुकाट्याने सहन करणे, दांभिकपणावर दुर्लक्ष्याची शालजोडी पांघरणे माझ्या स्वभावातच नाही. तेव्हा ठाकऱ्यांच्या जिभेला हाड नाही अशी टीकाकार जी टीका करतात, ती अगदी रास्त आहे.
मी नटही तयार करतो
धुळ्यास असताना नेहमीप्रमाणे सकाळी कलेक्टर भिडेसाहेब यांच्या बंगल्यावर गेलो असता, गप्पाटप्पांत त्यांनी विचारले "काय हो ठाकरे, तुम्ही नाटके लिहिता, पण नटवर्ग कसा जमा करता? फुटलेल्या नाटक मंडळीतलाच ना? " मी "छे, हा जुना पुराणा माल उपयोगी पडतो खरा, पण त्यावरच सारी भिस्त ठेवून भागत नाही. नवा माल आम्हांला तयार करावाच लागतो. व्हर्नाक्युलर झालेले २-४ कोणतेही तरुण मला आणून द्या, दोन दिवसांत त्याना रंगभूमीवर मी ठाकठीक उभे करून दाखवतो. खानदेशातले २-३ तरुण डेक्कन स्पार्कमध्ये आजही ठळक भूमिका वठवीत आहेत. "
यावर २-३ दिवसांनी भिडे साहेबांनी बाहेरगावचे ४ लेवा तरुण माझ्याकडे पाठवले. बरोबर त्यांचे शेतकरी पालकही होते. जो तुम्हाला पसंत पडेल त्याला ठेवा, बाकीच्यांना रजा द्या. असा निरोपही आली. माझ्या पद्धतीने मी त्यांची पहिल्याच मुलाखतीत चाचणी घेतली नि एका पोराला पसंत केला. दुसऱ्या दिवशी धुळे थेटरात `काळाचा काळ` नाटकाचा आमचा प्रयोग होता. रजपूतकालीन ऐतिहासिक नाटक. त्यात सुरुवातीसच नाटकाला एकदम उठाव देणारी भूमिका `हमीर` या पात्राची. तीच नेमकी मी त्या नवागत लेवा तरुणाला दिली. काम अचाट तडफीचे नि आकांडतांडवाचे. नाटकाला भिडेसाहेब आले. पहिला अंक संपला. ते आत आले, " काय हो, केल का काही काम त्या धाडलेल्या मुलानं? " मी “म्हणजे? हमीराचे काम पाहिलंतना? भिडे- वा, उत्तम, भयंकर धडाडीचं काम. मी- तुम्ही पाठवलेल्या नवथर मुलानेच ते काम केलं. भिडे-अस्सं ? माझा नाही विश्वास बसत. लगेच त्या मुलाला मेकपसह त्यांच्यापुढे आणून उभा केला. भिडेसाहेब आश्चर्यचकित झाले. "कमाल आहे ठाकरे तुमची. अहो, या पोरांनी नाटकसुद्धा जन्मात पाहिलेलं नाही अन् त्यानं हे काम करावं?" शाब्बास म्हणत त्यांनी पाठ थोपाटली.
कंपनीची छावणी भुसावळला
कंपनीच्या मुक्कामासाठी आम्हाला जैन मारवाड्यांची धर्मशाळा मिळाली. नाटक मंडळ्या नेहमी येथेच उतरत असत. धर्मशाळा भक्कम बांधणीची. तळमजल्यावर मोठमोठी दुकाने आणि वरचा सारा मजला कंपनीच्या बिऱ्हाडाला फारच सोयीस्कर, भुसावळचे थेटर गावापासून बरेच दूर पण नीट बांधलेले. खुर्च्या बाकांची कायमची व्यवस्था. सारी व्यवस्था तळमजल्यावरच. पिटाच्या उंचवट्यापासून खाली स्लोपने बैठकीची व्यवस्था. रंगमंच नि मेकप रुमही सोयीस्कर. आम्ही रंगमंच ठाकठीक उभा केला. आमची ४-५ मंडळी थेटरातच राहायची. फक्त चहा जेवणासाठी नि तालमीसाठी काही तास गावात मुक्कामाला यायची.
धुळ्याची धूळ भुसावळला
दि. ब. डोंगरसिंग पाटील हे ब्राह्मणेतर पार्टीचे खानदेशातले कट्टर पुढारी नि पुरस्कर्ते, सगळ्या स्थानिक संस्थाचे दण्डधारी अधिकारी आणि आमदार. त्यांचा आम्हांला पाठिंबा. त्यामुळे डेक्कन स्पार्क्सर बहिष्काराची भाषा जरी कोणी बोलण्याचे धाडस करीत नव्हता, तरी तो अमलात आणण्याचा निर्धार प्रत्येक भुसावळकर बामणाने केला होता. त्यांनी एक त्रास देण्याची युगत काढली. " अहो तुमच्या धर्मशाळेत ती नाटक मंडळी उतरली आहे ना, तीत ३-४ महार जातीची मुले आहेत. तुमची धर्मशाळा वाटली." अशी त्या जैन मारवाडी पंचाची कानचावणी केली. मग हो काय, एक दोन महात्मे पंच आले माझ्या भटीला तक्रार घेऊन. कंपनीत ३-४ महार शिकाऊ नट होते. पण ते थेटरातच रहायचे. फक्त जेवण नि तालमीसाठी धर्मशाळेत यायचे. "आमच्यात महार कोण, ते त्याचा हात धरून दाखवा, म्हणजे आत्ता बिऱ्हाड खाली करतो", असे चैलेंज देताच, ते गांगरले आणि या कुचाळीचा उगम कोठे झाला ते गौप्य स्पष्ट सांगून ते परत गेले. आमचे नाटकाचे प्रयोग चालू झाले. बामणतर सर्व समाजाकडून आम्हाला चांगला आश्रय मिळत गेला. मध्यंतरी तत्कालीन नामवंत नकलाकार घोडके हे आपला संच घेऊन भुसावळला आले. आमच्या रंगमंचावर त्यांनी आडवारी ३-४ प्रयोग केले नि गेले.
बहिष्काराचा काटा काढला
दि. ब. डोंगरसिंगांना बामणांचा बहिष्कार चांगला माहीत होता. ते स्कूल कमिटीचे चेअरमन होते. शिक्षकवर्ग सगळा ब्राह्मण होता. त्यांनी प्रत्येक शाळेच्या हेडमास्तरला बोलावून तोंडी हुकूम दिला की डेक्कन स्पार्क्सच्या विधिनिषेध नाटकाची २-२ रुपये दराची तिकिटे प्रत्येक मास्तराला द्या नि त्याचे पैसे पगारातून कापून माझ्याकडे भरणा करा. तिकिटे घेऊनही ते नाटकाला आले नाहीत तरी चालेल, पण तिकिटे घेतलीच पाहिजेत. प्रयोगाला बरीच गर्दी झाली. गावातले अनेक श्रेष्ठी आले होते, प्रयोगही छान वठला. काही मास्तर मला भेटले. "तुमची नाटके तर प्रागतिक मतप्रसाराची आहेत. मग बहिष्काराचे संदेश गावोगाव का फैलावले जातात. कळत नाही."
थेटरात एक बाई आली आहे
आणि ती मला भेटू इच्छिते. तिला घेऊन या इकडे. रात्री १० ची वेळ. ही १६-१७ वर्षांची तरुणी. मी धुळ्यास असताना, हिची हकिकत कानावर आली ती अशी तेथे एक गरीब कुटुंब रहात होते. धुळ्याला प्लेग झाला, त्यात हे सारे कुटुंब इस्पितळात मृत्यू पावले. फक्त एक मुलगी शिल्लक राहिली. अस्थिपंजर अवस्थेत तिला एका कायस्थ प्रभू श्रीमंत वकिलाने आश्रय दिला आणि लगेच घरकामाला जुंपली. ती बिचारी सांजसकाळ स्वयंपाक करायची. वकीलसाहेबांकडे नेहमी मेजवान्या व्हायच्या. पण या पोरीला त्यातला एक तुकडाही चाखायला मिळायचा नाही. तिला फक्त डाळभात. महिन्याभरात ती अगदी पिळून निघाली. एक दिवस परांजपे नावाच्या कुंटिणीने तिला गाठली आणि आपल्या घरी आसऱ्याला आणली. ही बातमी माझ्या सहकारी पहिलवानाने सांगितली. कसेही करून तिला माझ्या भेटीला आणा. असा हुकूम मी दिला. २-३ दिवसांनी रात्री ९-१० च्या सुमाराला ती आली. मी तिला म्हटले, "या माझ्या ५ मुली आहेत. तू सहावी म्हणून खुशाल माझ्या कुटुंबात सामील हो. पण त्या कुंटिणीकडे राहू नकोस." माझ्या पत्नीनेही तिला दिलासा दिला. ती होकार देऊन गेली ती अचानक बसचे तिकीट काढून डिरेक्ट माझ्याकडेच भुसावळला आली. कंपनीतल्या सगळ्यांनी तिला फार प्रेमाने वागविली. ती आमच्या आचाऱ्याला हाताखाली काम करायची. थोड्याच दिवसानी ती म्हणाली, "मला नाटकात काम करायचे आहे." तिला खरा ब्राह्मण नाटकात सीतेची भूमिका दिली. पहातो तो रोज नाटकाच्या तालमी पाहून, तिची नक्कल चोख पाठ. पुढे ती रंगमंचावरही उत्तम भूमिका करू लागली. काही महिन्यांनंतर, मी कंपनी गुंडाळल्यावर, ती माझ्या कुटुंबात राहू लागली. पुढे तिचे मी एका तरुणाशी लग्न लावून दिले. तिला दोन मुलगे झाल्यावर क्षयाने पतिगृही वारली.
गाडगे बाबांचे शिष्य भोवले
"जळगावला थेटर मिळत नाही, तर मी देतो बांधून आपण जळगावला चला." असे एका कंत्राटदाराने आश्वासन दिले आणि त्याने थेटर बांधायलाही सुरवात केली. त्याच वेळी गाडगे बाबांचे एक शिष्य म्हणविणारे संभावित गृहस्थ भेटले. जळगावच्या पहिल्या खरा ब्राह्मण प्रयोगाचे कंत्राट घेऊन रोख रु. २०० आम्हांला देण्याचे निश्चित केले. म्हणे, जळगावला नि पंचक्रोशीत गाडगे बाबांचे हज्जारो शिष्य आहेत. आम्ही हा हा म्हणता थेटर नुसते फुलवून दाखवू झाले. कंपनी जळगावला आली. पण त्यावेळी आम्हांला फैजपूरच्या नाना महाजनांची ती जागा मिळाली नाही. ती भरली होती. भाड्याने एक छोटासा बंगला घेऊन आम्ही राहिलो. पहिला प्रयोग कंत्राटाचा. तो केला. आणि काय सांगावे महाराजा. तो २०० रुपयेवाला कंत्राटदार टाळाटाळ करू लागला. त्याचा खूप पिच्छा पुरवला, पण अखेर तो जळगावहून पसार झाला तो या क्षणापर्यंत पुन्हा जिवंत अथवा मेलेला भेटला नाही.
पहिल्या खेळाची तिकिटे त्या शिष्योत्तमानेच विकल्यामुळे, आमच्या हातांत काहीच पडले नाही. फार मोठा प्रसंग तो. तरीही कै. चित्रे वकिलांच्या पाठिंब्याने आम्ही खेळ लावीतच होतो. त्यातल्या तुटपुंज्या उत्पन्नावर कसेतरी भागवीत होतो. पावसाळा डोक्यावर आलेला. येथून पुढे जाणार तरी कुठे? सगळीकडेच थेटरे बांधून देणारे भेटणार थोडेच? येथे मात्र बामणांचा बहिष्कार कट्टर भोवला. पाऊस सुरू झाला. थेटर मोडले आणि आम्ही आणखी एका नव्या घरात पडदे गुंडाळून स्वस्थ बसलो. यापुढे मुंबईच्या बाजूला गेल्याशिवाय गत्यंतर नाही, असा विचार करून आम्ही कल्याणचे तुकाराम थेटर ठरविले. पण तेथे तरी जायचे कसे? खिसा आरपार फाटलेला. शिवाय, सारे कुटुंब पुण्याला अडकलेले त्यांना बरोबर घ्यायला हवे.
मोठा घोर चिंतेचा प्रश्न
धावण्याला देव धावला
नव्या बिऱ्हाडाच्या ओसरीवर बसलो असता, रस्त्याने एक तरुण चालला होता, त्याच्या नजरेला मी पहताच तो उमाळ्यानेच माझ्याकडे धावत आला, "ठाकरे मामा, इकडे केव्हा आलात?" याचे नाव जोशी. कर्जतला माझ्या भोवती जी अनेक ब्राह्मण तरुणांची गादी जिव्हाळ्याने जमलेली होती. त्यांपैकीच हा एक. तो जळगाव येथे जी. आय. पी. रेल्वेत नोकरीला होता. त्याला सर्व परिस्थिती सांगितली. "हातेच्या. तुम्हांला कल्याणला जायचे ना? ते काम माझ्याकडे लागले. तुमच्यासाठी एक डबा रिझर्व्ह समजा. कधी निघता? पुण्याहून तुमची मंडळी चाळीसगावला सुखरूप आणून तुमच्या डब्यात बसविण्याची हमी मी घेतो. "
लगेच आम्ही बांधरुंद केली. जोशीने रेल्वेचे हमाल व गाड्या पाठविल्या. आम्ही ठरल्या येळी गाडीत बसलो. माझे चाळीसगावाला कुटुंब हजर होते. कल्याणला पोहचलो. स्टेशनमास्तर हजरच होते. "ठाकऱ्यांची मंडळी ना तुम्ही? चला बाहेर" बाहेर हमाल नि हातगाड्या तयार, आमचा सारा कबिला बिनबोभाट तुकाराम थेटरात दाखल झाला. किती नि कोणत्या शब्दांनी मानावे त्या माझ्या कर्जतकर जोशी मित्राचे आभार ?
कल्याणचे नि माझे हाडवैर !
वयाच्या १४-१५ वर्षापासून पहात आहे, नव्हे, चांगला अनुभव घेतला आहे की जेव्हा जेव्हा माझा आणि कल्याण शहराचा संबंध आला, तेव्हा बोलबोलता माझा सत्यानाश झाला. असे का व्हावे, या गूढाचे बूड अजूनही माझ्या हाती लागलेले नाही. तेथील स्मॉल कॉज कोर्टात माझे वडील काम करीत असताना, साहजिकच आमचे सारे कुटुंब तेथे गेले. अवघ्या एक वर्षाच्या आतच त्यांची नोकरी गेली, माझा १२ वर्षाचा धाकटा भाऊ एकाकी नाळगुदाच्या आजाराने मरण पावला. आमची अक्षरश: होय, अगदी अक्षरश:- अन्नान्न दशा झाली. तो सारा इतिहास मागे सविस्तर वर्णन केला आहे. त्यानंतर आता तुकाराम थेटरात नाटक कंपनी घेऊन प्रवेश केला, तेव्हाचा प्रसंग सांगतो ऐका.
तुकाराम थेटर उत्तम बांधणीचे नि सोयीस्कर कंपनीच्या वसतीलाही चांगले. पण थेटरवर पत्र्याची शाकारणी कसल्यामुळे पावसाच्या भर हंगामात सरीवर सरी कोसळू लागल्या का प्रयोग चालू असताना ताशे ढोल बडविल्याचा आवाज चालू व्हायचा. पात्रांची भाषणेही श्रोत्यांना ऐकू जायची नाहीत. मग हो काय? साऱ्या प्रयोगाचा विचका! त्या काळी लाऊड स्पीकर्स बोंबल्यांची टूम निघाली नव्हती. आणि मी म्हणतो, चालू असती तरी पत्र्यावरच्या खडखडाटापुढे त्याची खास डाळ शिजली नसती. आम्ही तेथे आलो तेच मुळी खंकरक अवस्थेत. साळयाची गाय नि माळ्याचे वासरू करून आम्ही कंपनीचे १५-२० लोक आणि शिवाय कुटुंबाच्या पोटापाण्याची सोय लावीत होतो. म्हटले, आता खेळ चालू झाले का पडतील टाके फाटक्या खिशाला. पण कसचे काय नि कसचे काय. आम्ही खेळ लावला, दिवसभर उजाडी नि ७-८ वाजले का मेघराज हटकून यायचे तिकिटाशिवाय प्रयोग साजरा करायला. बुधवार व शनिवारी रविवारी आम्ही खेळ करीतच होतो. पण पावसामुळे लोक घराबाहेर पडायचे नाहीत आणि पडलेच तर पत्रे महाशयांच्या खडखडाटामुळे त्यांना नाटक नीट पाहता नि ऐकताच यायचे नाही, एकदा पावसाने कृपा केली. त्या रात्री नि दिवसा उजाड लाभली. आमचे ‘काळाचा काळ’ हे रजपुती ऐतिहासिक नाटक खूपच रंगले. थेटरचे व्यवस्थापक शिर्के म्हणाले, "अहो असे भरदार नाटक लावलेत का हवा तेवढा पैसा मिळेल तुम्हांला. मी म्हणालो, "ते खरे हो. पण गेल्या आठवड्यात दोनदा लावले, तेव्हा तुमच्या थेटरच्या ताशा वाजंत्र्याने केलाच ना सारा घोटाळा !"
इतक्यात माझे चुलत सासरे के नागोजीराव गुप्ते भिवंडीहून आले, त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला आणि माझे सारे कुटुंब मुलाबाळांसह भिवंडीला घेऊन गेले. आम्ही महिनाभर प्रयोग करीतच होतो. पण आशादायक उत्पन्नाचे चिन्हच दिसेना, थेटरचे भाडे अंगावर वाढवीत बसण्यापेक्षा, कल्याणातच छावणीसाठी स्वतंत्र जागा घ्यावी आणि पावसाळा संपण्याच्या बेताला प्रयोग चालू करावे, असा बेत केला. मंडळींनी गावाबाहेर डॉ. नेने यांचा बंगला भाड्याने घेतला आणि ‘आम्ही जातो आमुच्या गावा` चा रामराम तुकाराम थेटरला ठोकला. दरिद्री चले दरयेकू करम चले साथ, मोतनखातर डुब्बी मारी तो...
शंख लगे हात
काही त्रास चुकविले तरी कंपनीतल्या १५-२० जणांच्या पोटापाण्याचा प्रश्न हात धुऊन मागे लागलाच होता. त्याची कशीबशी सोय लावीत कसाबसा पंधरवडा काढला. कंपनी बंद करावी तर नटांना गावोगावी परत जाण्यासाठी रेलभाडे तरी द्यायचे कुठून? पण मंडळी खरोखरच सुजाण होती. प्रत्येकाने घरी पत्रे पाठवून प्रवासखर्च मागवला आणि बहुतेकांनी घरचा रस्ता सुधारला. राहिली फक्त ५-६ जिवाभावाची मंडळी.
अखंड दगदग नि चिंतेने मी आरपार पोखरून निघालो. मला ताप येऊ लागला. रोज १२ वाजता १०४ डिग्रीपर्यंत चढायचा नि सायंकाळी ६ वाजता दरदरून घाम फुटून जायचा. बाकी सारी व्यवस्था श्री. टिपणीस आपुलकीने पहायचे. सारा भार मी त्यांच्यावर सोपवला. मुख्य व्यवस्था रोजच्या शिध्याची. ती कशीतरी लावीत असतानाच, गणेश चतुर्थी आली. आजूबाजूला खेडवळांची वस्ती बरीच होती. गणेशपूजनासाठी त्यांना भट मिळेना. नाटकातली नाटक मंडळी. आमच्या रामभाऊ हरण्याने डोके लढवले. कपाळाला मोठे गंध, अंगाला भस्माचे पट्टे. गळ्यात (कसल्यातरी सुताचे बनविलेले) जानवे घालून तो एका खेडुताच्या गणपतीची पूजा करायला गेला. आठवतील ते श्लोक, मराठी संस्कृत, काही स्पष्ट काही अस्पष्ट बडबडत, त्याने सांग पूजा केली. मग हो काय विचारता? रुपया दक्षणा, शिवाय सूप भरून शिधा. डांगर दुध्याभोपळा वगैरे भाज्या भटजीच्या पदरात पडल्या. आणखी मागण्या आल्या. सुमारे ४-५ तास तो या कामात गर्क मंडळींना ८ दिवस पुरेल इतका शिधा नि भाज्या घेऊन आला.
माझा आजार सारखा वाढतच चालला. ही बातमी भिवंडीला कळली. लगेच सौभाग्यवती रमा घोड्याचा टांगा घेऊन आली तेथे आणि मला कसलाही उजगर न देता टांग्यात बसवून भिवंडीला घेऊन गेली. डॉ. ताम्हणे यांचे औषधोपचार चालू झाले. निघताना. “आता पुढचा मार्ग तुमचा तुम्ही शोधा, मी जातो, असा निर्वाणीचा आदेश मी टिपणिसाना दिला.
हा स्नेहसंबंध खरा
भिवंडीला मी येताच माझ्याभोवती तेथील एक दोन उत्साही तरुणांचे कोंडाळे दिमतीला कायमचे हजर. त्यात तेथले मामलतदार कै. पट्टेकर याचा जवान मुलगा श्री. गजानन पट्टेकर तर २४ तास माझ्यासमोर असायचा. काय हवे ते सांगा. आता पुरे पाडतो, ही त्याची जिद्द. सौभाग्यवती त्यांचाच टांगा घेऊन आली होती नि तोही तिच्या बरोबरच होता. दोन दिवस झाल्यावर मी म्हटले, "गजानना, काय वाटेल ते कर, पण माझी दोन पोरे, विमल (धुळ्याहून भुसावळाला आलेली) आणि रामभाऊ हरणे यांना कल्याणहून घेऊन ये. ती दोघे मुलाबाळांतच असली पाहिजेत." एवढेच ना ? गजानना म्हणाला. "आता निघालोच मी." गजाननाने आपला टांगा जोडला आणि ३-४ तासांच्या आतच त्याने त्या दोघांना माझ्यापुढे उभे केले. विमल कशी आली ते मागे सांगितलेच आहे. आता....
रामभाऊ हरणे कोण ?
आम्ही जळगावला असताना वऱ्हाडातले एक प्राथमिक शिक्षक श्री. बाहकर हे एका १२-१३ वर्षांच्या मुलाला घेऊन आले. "या मुलाचे नाव रामभाऊ हरणे. हा एका घरंदाज मराठा शेतकऱ्याचा मुलगा. याच्या आईबापांनी याला तुमच्या हवाली करायला मला सांगितले आहे. हा तुमचा मुलगा आहे असे समजून याचे भविष्य बनवा, असे त्यांचे म्हणणे आहे. बाहकर मास्तर म्हणाले. ठीक आहे म्हणून मी त्याला पत्करले. रामभाऊ फार चलाख, आज्ञाधारक आणि येईल त्या परिस्थितीची कोंडी हुकमी फोडण्यात चतुर. माझ्या दुखण्यात त्याने फार श्रम घेतले. माझ्या सगळ्या मुलांत सौभाग्यवतीला राम भाऊचा फार लळा, लहान मोठे काहीही काम असो का तिने मारलीच रामभाऊला हाक. हा अखेरपर्यंत माझा कुटुंबातच वाढला. दादरला शाळेत गेला आणि अखेर इण्टरपर्यंत शिकून, शिंद्या स्टीम नॅविगेशन कंपनीत मोठ्या पगाराचा अधिकारी आहे. अलिकडे तो वांद्र्याच्या एम. आय. जी. कॉलनीत.... कलानगराहून एका हाकेवर ओनर्स फ्लॅट घेऊन, पत्नी, एक मुलगा नि एका मुलीसह सुखाने रहात असतो. मुलगा चांगला मिळवता आहे आणि मुलगी लवकरच ग्रॅज्वेट होईल.
प्रकरण २१
चलो भाई केईएम मे
माझा आजार इतका वाढला की डॉक्टरनीही आशा सोडली. अचानक माझा धाकटा भाऊ यशवंत ऊर्फ बुवा भिवंडीला आला. बरोबर त्याचा मुलगा बाबा, संतुराम कर्णिक आणि आणखी दोघेतिघेजण दादांना मी के.ई.एम. मध्ये घेऊन जातो. दादांची संमती आहे. पहा बुवा, डॉ. म्हणाले. प्रकृती इतकी क्षीण झालीय का त्यांना हलविल्यास कदाचित वाटेतच प्राणोत्क्रमण होण्याची मला धास्ती वाटते. ठीक आहे. बुवा म्हणाला, तुम्ही आमच्या बरोबर तेथपर्यंत चला. वाटेत कारभार आटोपलाच तर तुमची सोबत साक्षीला बरी पडेल.
लगेच एक स्टेशन वॅगन भाड्याने ठरवली. मी माडीवर होतो तेथून अलगद मला खाली वॅगनमध्ये न्यायचा कसा? जवळच नाना जोशी पहिलवान होते. त्यांनी मला गुंडाळून अलगद वॅगनमध्ये ठेवले. दादरची आलेली मंडळी. डॉ. ताम्हणे, गजानन पट्टेकर माझ्याबरोबर निघाले. मध्यरात्री दिडाच्या सुमाराला गाडी हास्पिटलच्या दारात आली. लगेच एका स्ट्रेचरवर मला घेऊन आत नेले. तेथे एका टेबलावर ठेवले. १५-२० मिनिटे झाली, पण एकही डॉक्टर फिरके ना. गजानन पट्टेकर चिडला. त्याने हास्पिटलचे डीन श्री. जीवराज मेहता कोणत्या बंगल्यात रहातात, याची चौकशी केली आणि तडक तिकडे गेला. बेल वाजवली. हातात टॉर्च घेऊन जीवराज बाहेर आले. गजाननने सांगितले, "सर, एक्सक्यूज प्लीज. आपल्या अंतर्जातीय विवाहावर अभिनंदनाचा लेख लिहिणाऱ्या लेखकाची आपल्याला आठवण आहे का? त्याचा तो लेख सगळ्या गुजराती पत्रात भाषांतरित होऊन आला होता." मिसेस मेहता चटकन म्हणाल्या, यसयस, हिज नेम वॉझ, इफ आय रिमेंबर राइट, परबुधन थॅकरे." गजानन, म्हणाला "सर, तोच इसम सीरिअस कण्डिशनमध्ये आम्ही भिवंडीहून घेऊन आलो आहोत. पण गेला अर्धा तास एकही डॉक्टर फिरकला नाही." लगेच जीवराज तसेच निघाले. ते निघाले असे पहाताच २-३ डॉक्टर धावतच आले नि काय झाले, काय झाले विचारू लागले. चिडलेला गजानन म्हणाला, "आता खुद्द डीनसाहेबच येताहेत, त्यांनाच आमचे डॉक्टर काय सांगायचे ते सांगतील. "जीवराजाना डॉ. ताम्हणेनी प्रकृतीचा इतिहास सांगितला. त्यांनी लगेच कॅथेटर घालून लघवी बाहेर काढण्याचा हुकूम दिला. ती क्रिया साधारण १५ मिनिटे चालली होती. माझी शुद्ध गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी जागा होऊन पहातो तो मला एका स्पेशल रूममध्ये ठेवलेला होता.
"केईएम` मधील कथा नि व्यथा
दुसऱ्या दिवशी सकाळीच टाइम्स प्रभृती बहुतेक सर्वभाषीय वृत्तपत्रांत प्रबोधनकार ठाकरे या विख्यात पत्रपंडिताला भिवंडीहून आणून के. ई. एम. मध्ये अत्यवस्थ अवस्थेत ठेवण्यात आले आहे ही बातमी छापून आली. लगेच सात वाजता डीन जीवराज मेहता यांना मुंबईचे (त्यावेळचे अॅक्टिंग) गव्हर्नर ना. रॉबर्ट डंकन बेल यांचा फोन आला. प्लीज टेक स्पेशल केअर ऑफ द पेशण्ट. हू इज माय फ्रेंड अॅण्ड टीचर, (रुग्णाची विशेष काळजी घ्या. ते माझे स्नेही आणि शिक्षक आहेत.) माझा नि बेल साहेबांचा संबंध कसा जुळला ते मागे सांगितलेच आहे.
पाठोपाठ इलेक्ट्रिकल इंजिनिअर टू गव्हर्नमेण्ट (म्हणजे ज्या खात्यात मी रेकॉर्ड सेक्शनचा हेड क्लार्क म्हणून काम करीत होतो त्याचा मुख्य गोरा साहेब) याचा जीवराज मेहतांना फोन आला. आज माझ्या कचेरीतला सगळा स्टाफ ठाकरे यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलात येणार आहे `, असा संदेश. लगेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही ` माझ्या काही अनुयायांसह भेटीला येत आहे`, असा फोन. बॅरिस्टर जयकर यांचाही फोन आला. तेव्हा डीन प्रभृती सर्व डाक्टरांना पटले का आलेला हा पाहुणा फार बडा असामी दिसतो.
सकाळी मला वात झाला
बेशुद्धावस्थेत मी बडबडू लागलो. लगेच दोन तीन डॉक्टर धावले आणि त्यांनी माझ्या डाव्या दण्डाला टोचून रक्त काढण्यासाठी यंत्र नि बाटली लावली. एक डॉक्टर उजव्या बाजूला मला घट्ट धरून बसला नि गप्पा मारू लागला. हा विधी १५ मिनिटे चालला होता. नंतर मला झोप लागली. सबंध दिवस ग्लानीतच होतो. इतक्यात सिस्टरने काही मेहतर आणून दरवाजावर उभे केले. माझी ग्लानी चालूच होती. ओळखपाळस पार गेली, डॉ. आंबेडकर येऊन जवळ बसले. त्यांचे अनुयायी एका दरवाजाने आत येत आणि नमस्कार करून चटकन दुसऱ्या दरवाजाने मेहतर त्यांना बाहेर घालवीत होते. थोड्याच वेळात आला इलेक्ट्रिकल एंजिनिअरच्या हापिसातला ३०-४० दोस्तांचा ताण्डा, तेही वरील पद्धतीनेच नमस्कार करून गेले.
जीवराज मेहतांच्या अमदानीत अँग्लो इंडियन नर्सेस होत्या. त्या फार कनवाळू नि आपले काम वेळच्या वेळी चोख बजावणाऱ्या आणि रुग्णाशी गोड बोलून काम करणाऱ्या असत. सॉलिड फूडचा मला तिटकारा आला म्हणून लिक्विड फूडवरच ठेवण्यात आले. दररोज संध्याकाळी सहा वाजता डीन साहेबांची स्वारी स्वतः प्रत्येक वॉर्डात प्रत्येक रुग्णाची हालहवाल तपासायला यायची. त्यावेळी संबंधित डॉक्टर हजर असायचा. अशा पुष्कळ गोष्टी सांगता येतील. पण ते भारूड आता कशाला ?
दोन महिन्यांनी सुटका झाली
पत्नी सौ. रमा आठवड्यातून दोन तीन वेळा भिवंडीहून भेटायला यायची. भावजय मात्र दररोज. कारण ती दादरला रहायची. अखेर दिवाळीच्या सुमाराला सुटकेचा निर्णय घेण्यात आला. भिवंडीची स्टेशन वॅगन घेऊन तेथली काही मंडळी येऊन दाखल झाली. भावजयने पुढाकार घेतला. तेथल्या मेहकर सेवकांना काही बक्षिसी द्यावी, ही बुवाची इच्छा. पण ते काही केल्या घेतच ना. "साहेब आम्हाला पगार भरपूर मिळतो, बक्षिसी कशाला ? माफ करा." अशी होती त्या काळची जीवराज मेहतांची कदर. तेथल्या पेटीत मात्र बुवाने एक ठोक रक्कम टाकली नि आम्ही निघालो.
अखेर आलो एकदाचा भिवंडीला
त्यावेळी निघताना डॉक्टराने माझे वजन केले. किती पौण्ड माहीत आहे ? बिनचूक एकाहत्तर पौण्ड, तरीही लोक म्हणतात. ठाकरे काही वजनदार असामी नव्हे. पुढच्या उपचाराचे कार्य डॉ. ताम्हण्यांनी हाती घेतले. नर्सिंगचे काम सौ. रमा आणि माझी थोरली मुलगी सुधा यांनी कसोशीने चालवले. सुमारे महिनाभर मला चालताच येत नव्हते. दोन महिन्यांनी मला रोज सकाळी रामभाऊ बाहेर फिरायला घेऊन जायचा. उत्कृष्ठ नर्सिंगने मी तीन महिन्यांत खडखडीत बरा झालो नि एक दिवस भिवंडीहून निघून दादरला बुवाच्या बिऱ्हाडी दाखल झालो. अॅलोपथिक इंजेक्शनच्या भरपूर माऱ्यामुळे, अंगावर खरुज फुटली. इतकी की सर्वांगभर खरुजच खरुज! वैतागलो अगदी येथली नर्स भावजय. तिने रोज प्रत्येक फोडावर हरभऱ्याच्या ओल्या पिठाचा लेप लावावा नि वाळल्यावर मला न्हाणीघरात नेऊन आंघोळ घालावी. एक महिना ह्या खरजेने फस्त केला.
पोटापाण्याचा प्रश्न सुटणार कसा ?
दादरला मी आल्यावर अनेक रनेही सोबती भेटायला आले. त्यात श्री. पुरुषोत्तम बाळकृष्ण कुळकर्णी यांचा उल्लेख मुद्दाम केला पाहिजे. ते नुसते `कसे काय आहे ? विचारायला तर आले होतेच पण एक माझ्या जोगते लेखनाचे कामही घेऊन आले. त्यावेळी त्यांच्या मित्रमंडळाने ‘नवा मेनू’ नावाचे एक साप्ताहिक चालू केले होते. त्यात मी दर आठवड्याला एखाद्या ठळक मथळ्याखाली वर्तमान घटनांवर मार्मिक टीका टिपणी करावी, अशी त्यांनी विनंती केली. मानधन म्हणून दरमहा रु. ५० ठरवले. म्हटले, चला ही गजाननाची सुपारी ठीक आहे. २-३ आठवडे स्वतः कुळकर्णी दादरला येऊन लेख घेऊन जायचे, पण पुढे भी नवा मनू कचेरीतच जाऊन बसू लागलो. तेथे ताम्हनकर नि अप्पा पेंडसे हे स्नेही जोडले गेले. माझ्या लेखांचा मथळा असे तात्या पंतोजीच्या छडा.
नेहरूकृत शिवाजीची कुचाळकी
या सुमाराला नेहरू लिखित ‘ग्लिम्प्सेस ऑफ इण्डिया` या इंग्रेजी ग्रंथात अफजुलखान प्रकरणी शिवाजीला खुनी ठरवून पंडित जवाहरलाल नेहरूंनी कुत्सित टीका केल्याचे प्रकरण उद्भवले. माझा स्वाभिमान आणि स्वदेशाभिमान खडबडून जागा झाला. `रायगडची गर्जना गुर्रर्रर्र ड्राँक` या मथळ्याचे एक छोटेखानी पुस्तक लिहून छापून घेतले. १ आणा किंमतीला सर्वत्र फैलावले. के. दामोदर यंदे शेटजीने ते आपल्या एका मासिकात जशाचे तसे छापले. शिवाय मी इंग्रेजीतूनही भारतीय अनेक भारदस्त साप्ताहिक दैनिकांतूनही लेख पाठविले. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. नेहरूंनी जाहीर केले की, "मी तो ग्रंथ तुरुंगात असंताना आणि जवळ विशेष कागदोपत्री पुरावा नसताना लिहिल्यामुळे, ही चूक माझ्या हातून घडलेली आहे. संतप्त मऱ्हाठ्यांनी मला क्षमा करावी. पुढल्या आवृत्तीत योग्य ती सुधारणा मी अगत्य करीन." छान. एखाद्याने तुरुंगात ग्रंथ लिहावा वाटेल त्या महाराष्ट्रेतिहासिक श्रेष्ठाची टिंगल करावी. हा धंदा छान! काहीही असो, या रायगडच्या गर्जनेने महाराष्ट्राला समजले का ठाकरे वाघ मेला नाही, जागतज्योत जिवंत आहे आणि महाराष्ट्राची कुचाळी करणारांच्या अंगावर तात्काळ झेप घालायला सिद्ध आहे.
विमा कंपनीचे निमंत्रण
एक दिवस बुवा मला म्हणाला वॉर्डन इंशुअरन्स कंपनीचे मुंबई शाखेचे सेक्रेटरी श्री. मांजरेकर यांना विमा धंद्यात तुझ्या सहकाराची फार अपेक्षा आहे, म्हणून आपण त्यांना आज भेटायला जाऊ या. विमा विषय माझ्या डोक्यात कधी आलेलाच नव्हता. पण म्हटले चला. तर चला गेलो. मांजरेकरांना त्यांच्या बिऱ्हाडीच भेटलो. मी म्हटले, "विमा विषय माझ्या परिचयाचा नाही." मांजरेकर नसे ना का, तुम्ही येऊन टेबलावर नुसते बसा. महिना पंधरा दिवसांत सारे काही तुमच्या अटकळीत येईल. तुमच्या लेखनबहाद्दरीच्या करामतीचेच काम तुम्हाला मिळेल." पगार रु. १२५ दरमहा ठरला आणि मी वॉर्डन इंशुअरन्स कंपनीत खास टेबलावर जाऊन तेथल्या एजन्सीच्या फायल्यांची तपासणी करू लागलो. अनेक मोठमोठ्या लोकांच्या गाठीभेटी येथे रोज होऊ लागल्या. "मांजरेकर, यू हॅव स्पॉटेड आऊट ए व्हेरी फाईन अॅण्ड एबल मॅन फॉर प्रापॅगाण्डा परपजेस, (प्रचारकार्यासाठी तुम्ही फार लायक इसमाची निवड केलीत.) अशी जो तो प्रशंसा करू लागला. त्यावेळी सुप्रसिद्ध मानवेन्द्र रॉय हे डॉ. अब्दुल्ला नाव धारण करून मुंबईत भूमिगत रहात असताना कंपनीत वरचेवर यायचे. त्यांचीही कधीमधी माझी फार थोडा वेळ गाठभेट व्हायची. सुमारे दोन महिन्यांच्या आतच मी विमा धंद्याचा एक पुरा माहितगार बनलो. प्रचारकार्याची दिशा ठरविली. अनेक प्रचारपत्रिका तयार केल्या. महाराष्ट्रभर फैलावलेल्या एजंटांशी पत्रव्यवहार करू लागलो. त्यांच्याही गाठीभेटी होत गेल्या. सारांश अखेर एजन्सी सुपरिन्टेण्डंट, पब्लिसिटी मैनेजर ही कामे संपूर्णपणे मजकडे आली.
एक साप्ताहिक हातात आले
मुंबईत त्यावेळी सौ. मालती तेंडूलकर या बाई ‘प्रतोद’ नावाचे मराठी साप्ताहित चालवीत होत्या व वॉर्डनची जाहिरात त्यात असे, मी तेथे आल्यावर त्यानी मांजरेकर यांना सांगून माझ्या सहकाराची विनंती केली. जाहिरातीचे दरमहाचे रु. ४० कंपनीने मला यावे आणि मी प्रतोदच्या संपादकाचे काम करावे, असे ठरले. हा कारभार एक वर्षभर सुरळीत चालू होता. या मुदतीत मी शेकडो विषयांवर कितीतरी लिहिले आहे ते चिकटबुकात जपून ठेवलेले आहे. वॉर्डनच्या पब्लिसिटीचे अनेकानेक प्रकार मी इतके फैलावले की इतर विमा कंपन्या वॉर्डनच्या हबक्याने दातओठ चावू लागल्या. त्यांची माणसे महाराष्ट्रात सर्वत्र कोठेही जावोत, त्यांचे स्वागत करायला सर्वत्र वॉर्डनची जाहिरात नि एजन्ट खडी ताजीम द्यायला तयार, खुद ओरियण्टलचा गोरा मैनेजर एका पत्रकाराजवळ म्हणाला की "पब्लिसिटीच्या बाबतीत वॉर्डनने अगदी कमाल केली. कोण विझार्ड (जादूगार) त्यांनी पैदा केला आहे कोण जाणे ?"
माझे महाराष्ट्रातील दौरे
वॉर्डन कंपनीच्या ठिकठिकाणच्या एजन्सीजचे काम पहाणे, नवीन एजन्सी स्थापन करणे, मयत पॉलिसीवाल्यांच्या क्लेम्सचा खरेखोटेपणा कसोशीने तपासणे वगैरे कामे करण्यासाठी मला वरचेवर दौऱ्यावर जावे लागत असे. पहिला दौरा रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, मिरज. सातारा, पुणे असा होता. पुण्याच्या कचेरीचे व्यवस्थापक श्री. हरबा नाईक होते. यांचा माझा स्नेह आजवर टिकून आहे. त्यानंतर खानदेश, वऱ्हाड आणि मध्य हिन्दुस्थानातील देवास-इंदोर येथवर आणि रोहे-महाड-गुरुड-जंजिरा येथवर दौरे झाले. ठिकठिकाणी माझी अनेक विषयांवर जाहीर व्याख्यानेही होत असत.
भयंकर कपट-नाटकाचा तडाखा
एका मयत पॉलिसीवाल्याच्या क्लेमचा शोध घेण्यासाठी मला रोहे आणि मुरुड जंजिरा येथे गुप्त चौकशा करावयाच्या होत्या. एप्रिल १९३८ च्या शेवटच्या आठवड्यातल्या रविवारी मी तिकडे दौऱ्यावर निघालो. जाताना सौ. ला सांगितले की दौरा फक्त एकच आठवडयाचा आहे, तेव्हा पत्रबित्र पाठवणार नाही. पुढच्या रविवारी बिनचूक परत येईन. प्रथम गेलो रोह्याला, तेथल्या संबंधित डॉक्टरची भेट घेतली, खुलासे काढले आणि साक्षीदाराचे नावपत्ते मिळवले. तेथून पडावाने रेवदंडा येथे येऊन, तेथून खाडी ओलांडून पुढे बसने मुरूडला गेलो, तेथे आमचे दादरचे कै. वामनराव खोपकर पेन्शन घेऊन रहात असत, त्यांच्याकडे उतरलो नि कामाला लागलो. अर्थात् मुरूडलाच गेलो, तेव्हा तेथला जंजिऱ्याचा किल्ला वगैरे अनेक प्रसिद्ध स्थळांना धावत्या भेटी दिल्याच. व्याख्याने, सत्कारादी विधी झालेच. चौकशीही पूर्ण झाली. शनिवारी सायंकाळी व्याख्यानासाठी बाहेर पडतो, तोच तार हातात पडली. ती होती तेथल्या मेडिकल ऑफिसरच्या नावाने. वायर प्रबोधनकार ठाकरेज हेल्थ, यशवंत ठाकरे. तार प्रिपेड होती. पण विचार करू लागलो, बुवाने तार पाठविलीच कशाला ? कारण काय ? मी लगेच उत्तर लिहिले, ` हेल्थ एक्सलण्ट कमिंग टुमारो.
पण मुरूडचे तार हापीस संध्याकाळी ६ लाच बंद होत असल्यामुळे, तार गेली नाही, परत आणली. मीही या घटनेकडे फारसे लक्ष न देता कार्यक्रमाला गेलो. रात्री ११ वाजता तो अटोपला. तेव्हा काही मंडळींनी विचारले, "दादा, आम्ही आज रात्रीच्या १ च्या बोटीने मुंबईला जात आहोत, येता का आमच्याबरोबर ?" मी म्हटले, "बाबांनो, मी आता थकलो आहे, उद्या सकाळच्या बोटीने निघतो." त्याप्रमाणे निघालो. सकाळी १० च्या सुमाराला बोट मुंबईच्या धक्क्याजवळ येऊ लागली. मी नाळेवर उभा होतो. धक्क्यावर श्री. व सौ. मालती तेंडूलकर आल्या होत्या. मी जिना उतरून येताच त्यांनी माझ्यापुढे मुंबईतल्या अनेक दैनिकांचे अंक धरले. मोठमोठ्या अक्षरांच्या हेडलायनी काय होत्या ?
प्रबोधनकार ठाकरे यांचा शोकजनक मृत्यू
मी अचंब्यातच पडलो, तरीही म्हटले, "काय हो, ही काय मिसचीफ आहे?" तेंडूलकर म्हणाले, "आधी लवकर घरी चला." आम्ही टॅक्सीने तिघे निघाली.
पण घडले होते तरी काय ?
शनिवारी दुपारी कोणीतरी वॉर्डन कंपनीत फोन केला. "माझे नाव कुळकर्णी, आजच जंजिरा मुरूडहून आलो. फार दुःखाची गोष्ट, तुमचे ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, काल शुक्रवारी टॉक्सिक पॉयझन होऊन एकाकी वारले. भी त्यांच्या घरी समक्षच जात आहे. नि तुम्हाला टेलिफोन करीत आहे. "
मग हो काय विचारता ? मांजरेकरांनी तेंडूलकरांना आणि कंपनीच्या यच्चावत संबंधितांना फोन करून बोलावले. आमच्या घरी ही बातमी कळवायची कशी ? यावर विचार झाला. अखेर तेंडूलकरांनी आमचे भाऊ यशवंतराव बुवाला सांगितले की जंजिऱ्याच्या इस्पितळात दादा आजारी आहेत. इतकेच. पण दुसऱ्या दिवशी रविवारच्या वृतपत्रांनी बोंब ठोकायची ती ठोकलीच. नेहमीप्रमाणे आमच्याही घरी वृत्तपत्रांची रास येऊन पडली. पण सौ. चा विश्वास बसेना. टॉक्सिक पॉयझन म्हणजे काय? तर आवाक्याबाहेर खाल्ल्याने झालेल्या अजीर्णाचे विष छट्! ती म्हणाली, "हे तर अगदीच अशक्य. ते कधीही वाजवीपेक्षा फाजील काही खातच नाहीत, हा अनेक वर्षांचा अनुभव. बरे, मुरुडचे वामनराव खोपकर तर आमचे अनेक वर्षांचे स्नेही. त्यांचे तरी तारपत्र यायला हवे, तेही नाही. मग हा कोण टेलीफोनवाला आला अचानक ?" वृत्तपत्रात बातम्या आल्या तरी ठाकऱ्यांच्या घरी शांतता कशी ? जो तो आश्चर्याने आमच्या कीर रोडवरील ब्लॉककडे नजरा फेकीत होता. पण सौ. अगदी शांत.
टॅक्सीने आम्ही निघालो तो प्रथम स्टार बेकरीसमोरील डॉ. वैद्य यांच्या दवाखान्यात गेलो. तेथे बुवा रात्रभर रडत होता. त्याला घेतला. जाताना मांजरेकर यांना खालून ओरडूनच सांगितले "मी आलो हो, मेलो नाही." तेथून गेलो श्री. गुप्ते (बी. इ. एस. टी. चे इले. इंजिनिअर) यांच्याकडे त्यांच्या मुलांच्या मुंजी होत्या, पण माझ्या मृत्यूच्या बातमीने त्यांनी भोजनाचा कार्यक्रम रद्द केला होता. "तसे काही करू नका, मी जेवायला येणार आहे", असे सांगून टॅक्सी घराकडे भरधाव सोडली. कृष्णा निवासच्या खाली येताच. माझी नेहमीचीच परिचयाची आरोळी `रामभाऊऽ गेली ऐकू सगळ्यांना. रामभाऊ धावतच आला. त्याने सामान वर नेले. मी वर जाताच मात्र सौ. ने आत्तापर्यंत निग्रहाने दाबून ठेवलेला उमाळा, गंगा ब्रह्मपुत्राचा पुराने बांध फुटावा तसा, फुटला. आजूबाजूला अनेक स्नेही, नातलग मित्र, शेजारीपाजारी जमले होते. अशा रीतीने या कपट-नाटकाचा शेवट झाला. ही ३ मे १९३८ ची घटना. लगेच दुसऱ्या दिवशी मी कोपर्डे अॅण्ड सन्स स्टुडिओत जाऊन माझा फोटो काढवला. मथळ्यावर त्याचा ब्लॉक छापून, प्रतोद साप्ताहिकाच्या ८ मे १९३८ च्या अंकात माझ्या मृत्यूचा खुलासा हा लेख लिहून, त्यात त्या टेलीफोनवाल्याच्या कारस्थानाचे सगळे धागेदोरे चव्हाट्यावर मांडले.
सत्याग्रही महात्मा गांधी सत्याग्रहाच्या वेढ्यात
वॉर्डन इन्शुअरन्स कंपनीचा एजन्सी सुपरिंटेंडंट नात्याने नी खानदेश वऱ्हाडच्या दौऱ्यावर होतो. अकोला येथे ज्या दिवशी आलो, त्याच दिवशी सायंकाळी म. गांधी हरिजन दौऱ्यावर तेथे येणार होते. शहरात काही ठिकाणी विरोधकांची गडबड चालल्याचे समजले. एका मराठा तरुणाने नव्यानेच काढलेल्या छापखान्याला भेट देण्यासाठी गेलो. वेळ सकाळी १० वाजता. छापखाना पहात असतानाच, तेथे एका कोपऱ्यात जाडजूड ५० लाठ्या नि शेजारीच काळ्या फडक्यांचे एक गाठोडे पाहिले. "हे रे काय इथं ? या लाठ्या कशाला?" विचारले. "अहो.
ही नसती ब्याद इथं आणून टाकली आहे काही मारवाडी तरुणांनी. आज संध्याकाळी म. गांधी येणार आहेत ना अकोल्याला. त्यांना हे लोक काळी निशाणे दाखवून त्यांचा निषेध करणार आहेत." त्या मित्राने खुलासा केला. "त्यासाठी या लठ्ठ दांडक्यांची जरूर काय ? म्हणजे, वेळ आली का काळी फडकी खिशांत कोंबून गांधीजींवर हल्ला चढवायचा बेत आहे की काय त्यांचा?" मी विचारले. "तेही करायला चुकणार नाहीत ते. फार खवळले आहेत ते गांधींवर.” त्याने सांगितले. "हे बघ आत्ताच्या आत्ता या लाठ्या नेऊन ठेव आतल्या खोलीत आणि ठोक टाळ खोलीला" मी फर्माविले, कंपाझिटरादी मंडळींनी लागलेच तसे केले. "ती मंडळी ४ वाजता येतील. त्यांना मी काय सांगू ?" "मी अकोल्याला आलोय, म्हणून आज तुझा छापखाना बंद ! सगळ्यांना सुट्टी." मी आणखी फर्माविले. छापखाना बंद करून आम्ही त्या मित्राच्या घरी फराळाला गेलो. जाताना वाटेत पोलीस खात्यातले चार पाच अधिकारी ओळखीचे निघालो. त्यांच्याशी थोडी बातचीत झाली. त्यांनीही शहरातल्या आंदोलनाची त्रोटक माहिती नि बंदोबस्ताची तयारी सांगितली.
संध्याकाळी ५-६ च्या सुमाराला कंपनीच्या एजंट ऑर्गनायझरांना भेटायला बाहेर पडलो. सकाळचे पोलीस अधिकारी भेटले. त्यांच्या गाडीतून शहराबाहेर (जिकडून म. गांधी नि त्यांचा परिवार येणार होता त्या बाजूला) गेलो. पहातात तो काय ? कापसाचे गठ्ठे घट्ट बांधण्यासाठी ज्या लोखंडी पट्ट्या वापरतात, त्यांच्यात मोठमोठे टोकदार खिळे अडकवून, त्या पट्टया सडकेवरच्या चकारीत लांबवर पसरून ठेवलेल्या. हेतू हाच की गांधीजींची गाडी आली का त्यातल्या खिळ्यांनी टायर्स फुटून गाडी पंक्चर व्हावी. "पाहिलंत, गांधींनी हरिजन उद्धाराचा प्रश्न हाती घेतलाय म्हणून या आर्थोडॉक्स लोकांचा संताप उसळला आहे तो !" एक इन्स्पेक्टर म्हणाला. पोलिसांकडून त्या पट्ट्या काढविण्यात आल्या.
नंतर आम्ही शहरात आलो. मी एका डॉक्टराच्या दवाखान्यात बसलो. त्याच रस्त्याने गांधी परिवार जाणार होता. दिवेलागणी झाली. पोलिसांची गडबड गस्त चालू झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोकांचे थवे उभे राहिले. "आले आले महात्मा गांधीकी जय" गर्जना होऊ लागल्या. पोलिसी गाडयांच्या बंदोबस्तात म. गांधींची गाडी आली गाडी जात असताना, मी उभा होतो त्या दवाखान्यापासून ५० फूट अंतरावरच्या झाडाची १ फूट व्यासाची खांदी कडाड मोडून रस्त्यावर आडवी पडली. गाडी थोडक्यात बचावली. ती खांदी आधीच तोडून ठेवलेली होती फक्त बुंध्याचा थोडासा भाग कायम ठेवून, दोरीच्या आधाराने लोंबकळत ठेवली होती. झाडावर कोणीतरी चढून गांधींच्या गाडीची वाट पहात होता. गाडी येताच त्याने कसल्यातरी शस्त्राने तो दोर तोडताच खांदी धडाड कोसळली. कोणीतरी चढला होता, हे मागाहून पोलिसांना उमगले. तात्काळ त्याला गिरफ्दार केले हे सांगणे नको. त्या राजरस्त्याच्या थेट टोकाला एक छोटेखानी बंगला होता. त्या ठिकाणी महात्माजींच्या वास्तव्याची व्यवस्था केली होती. तेथून जवळच असलेल्या भाटीया मैदानावर दुसरे दिवशी सकाळी ८ वाजता म. गांधीजींच्या व्याख्यानाची व्यवस्था ठेवली होती. बंगल्याला पुढच्या बाजूने कूस होते आणि जायला यायला फक्त एकच मोठा गेट-दरवाजा होता. आत थोडेसे आंगण होते. म. गांधींची सोय वरच्या मजल्यावर केलेली होती.
दुसरा दिवस उजाडला. सभेच्या ठिकाणी लोकांचे लोंढेच्या लोंढे लोटत होते. एक लाखावर जमाव जमला होता. खाकी हाफपॅण्ट, पायाला खाकी पट्टी नि बूट, अंगात शर्ट, हातात चांदीच्या मुठीची छडी आणि सोलो हॅट अशा थाटाने मी गांधी-निवासाजवळ येतो तो काय ? बंगल्याच्या अंगणात ४०-५० टोळभैरव छात्या उघड्या टाकून सताड उताणे पडलेले ! "जाना होय तो छातीपरसे जाव" या त्यांच्या गर्जना चालू होत्या. बाहेर रस्त्यावर पोलीस अधिकारी नि पोलीस तो तमाशा पहात दिग्मूढ उभे. "गांधीजींना बाहेर पडायला वाटच नाही. कसेही करून म्हाताऱ्याला बाहेर काढलेच पाहिजे, तिकडे तर पहाटेपासूनच मैदानावर लोकांची गर्दी, काय तरकीब काढावी", पोलीस अधिकारी नि मी खल करू लागलो. माझ्या ड्रेसमुळे मीहि पोलिसांपैकी एकसा दिसत होतो. "हे पहा, माझ्या युगतीने सांगेन तसे कराल काय? पाप पुण्याचा प्रश्न आता नाही. मी प्रथम बेधडक यांच्या छातीवरून चालत जातो. तुम्ही पाठोपाठ आले पाहिजे. आहे तयारी?" ठरले. "आणि हे पहा. हे लड्यू उठून बाहेर जाऊ पहातील तर त्यांना येथेच अटकवायला पोलिसी साखळी तयार ठेवा. चला." मी अंगणात पाऊल टाकले. "भाईओ, जानेको रास्ता दीजिये." विनविणी केली. त्यांचा एकच आवाज. "जाना होय तो हमारे छातीपरसे जाना." ठीक है, असे म्हणून मी त्यांच्या छातीवरून ताडताड बूट हापटीत निघालो. मागाहून पोलीस अधिकाऱ्यांनी तेच केले आणि आम्ही सारे वरच्या मजल्यावर बसलेल्या गांधीजींपुढे जाऊन उभे राहिलो, खाली सत्याग्रही लडधू आम्हांला सारखे शिव्याश्राप देत ओरडत होते.
मला पहाताच, "औं, ठाकरेजी, आप आज इधर कैसे ?" गांधीजी हसत हसत म्हणाले.
मी -- आपको प्रणाम करने आये. सभास्थानको जाना है ना आपको ? लाखो लोगोंकी भीड हुई है मैदानमे, चलिये, गांधीजी -- कैसे जाना? सत्याग्रहकी भीड पडी है ना. मी देखा. सत्याग्रह इज ए बिओजेड सोर्ड. (सत्याग्रह ही दुधारी तलवार आहे.) गांधीजी नुसते हसतात. आपको सभास्थानपर जानाही पडेगा महात्माजी" गांधीजी- कैसे जाऊं, कहो ना. मी- सत्याग्रहीके छातीपरसे, हम आये वैसे. गांधीजी नही नही. मेरेसे वैसा नहीं बनेंगा. यह तो बड़ा पाप है.
बोलण्यात आणखी वेळ न दवडता, मी त्या बंगल्याच्या जागा तपासल्या. पोलीस अधिकारी माझ्याबरोबर फिरतच होते. बंगल्याच्या मागे एक गल्ली होती. त्या बाजूच्या गॅलरीला लागूनच खाली कुसाची बुटकी भिंत होती. पोलिसांना विचारता, ती गल्ली रहदारीची नव्हती आणि तेथून थेट मैदानावर जाताही येत होते. बस्स. ठरले. गांधीजींच्या समोर सुतकी चेहरे करून बसलेल्या ५-६ जणांना गॅलरीत बोलावले. दोघांना कुसावरून खाली गल्लीत उभे केले. दोघांना कुसावर उभे केले आणि गेलो गांधींजवळ, "चलिये महात्माजी चलिये, सब तयारी हुयी. अब बातही करना नही." असे म्हणून मी त्यांना उठविले नि गॅलरीत घेऊन गेलो. पोलिसांच्या सहाय्याने गॅलरीवरून त्यांना कुसावरच्या दोघांनी घेतले, तेथून खालच्या दोघांनी अलगद खाली उतरविले. पोलीस अधिकाऱ्यांनी धडाधड उड्या मारून त्यांना सोबत केली आणि सारेजण चालत चालत झपाट्याने मैदानाकडे रवाना झाले. २-३ मिनिटांतच "महात्मा गांधी की जय" जयघोषाच्या आरोळ्या मैदानावर होऊ लागल्याचे कानी पडताच. अंगणातले सत्याग्रही लडधू भराभर उठून बाहेर पडू लागताच, दरवाजावर संगीनी रोखून पोलिसांनी अडवून धरले. मी सरळ त्यांच्या गर्दीतूनच बाहेर रस्त्यावर आलो आणि मैदानाकडे गेलो. सभास्थानी सत्कार व्याख्यान वगैरे कार्यक्रम सुरळीत पार पडला. सभा संपण्याच्या आधी काही मिनिटेच पोलिसांनी सत्याग्रहींना तेथून हुसकावून दिले, म्हणून गांधीजी सुखरूप बंगल्यात परत आले. त्या दिवशी दुपारीच ते पुढील मुक्कामाकडे रवाना झाले.
मारवाडी व्यापाऱ्यांचा धि:कार !
सबंध दिवसभर गांधी-विरोधकांची शहरभर छी थू होत होती. काहीजण तर त्यांच्या घरांसमोर जाऊन शिव्यागाळी करीत होते. विरोधकांत बरेच मोठमोठे व्यापारीही होते. लोकांनी त्यांना अनेक प्रकारच्या धमक्याही द्यायला कमी केले नाही. झाल्या गोष्टीबद्दल कित्येकांनी पश्चात्तापही व्यक्त केला. कारखान्यांतला कामगार वर्गही खवळला. सार्वजनिक संतापाचे ते विराट स्वरूप पाहून काही व्यापाऱ्यांनी स्थानिक ब्राह्मणेतर पुढारी आणि पोलिसांच्या मध्यस्थीने कॉटन मार्केटच्या आवारात त्याच रात्री माझे व्याख्यान ठरविले. व्याख्यानात पडलेल्या सगळ्या घटनांचा पाढा स्पष्ट बोलून, विरोधकांच्या हीन वृत्तीचा मी खरपूस समाचार घेतला. २-३ बड्या मारवाडी व्यापाऱ्यांनीही पश्चाताप व्यक्त केला आणि महात्मा गांधीजींची जाहीर माफी मागितली. संतप्त जनतेने व्यापारी वर्गाविरुद्ध केलेल्या घोषणांची शांती व्हावी, हा ती सभा बोलावण्यातला हेतू होता. त्याप्रमाणे अखेर जनतेने अपराध्यांना क्षमा करून शहरातली शांती कायम ठेवावी, अशी विनंती करून मी सभा संपविली.
मोशीला पुन्हा भेट
त्यानंतर ४-५ दिवसांतच माझ्या दौऱ्याची छावणी अमरावतीला पडली. नेहमीप्रमाणे डॉ. पंजाबराव देशमुखांच्या बंगल्यावर जातो तोच ते म. गांधींना आणण्यासाठी दर्यापूरला गेल्याचे कळले. संध्याकाळी ते आले. अमरावतीचा कार्यक्रम आटोपून दुसऱ्या दिवशी गांधींचा दौरा मोर्शीला जायचा होता. पंजाबरावांनी मला बरोबर नेले. तेथे नानासाहेब अमृतकर, वकील, यांच्याकडे गांधींचा मुक्काम. मीही तेथलाच पाहुणा,
मोर्शीला त्या दिवशी सकाळपासून पावसाची झिमझिम सारखी होती. संध्याकाळी थांबली. हवा कुंद नि थंडगार. आकाश मनस्वी ढगाळलेले. सभेची व्यवस्था ठाकठीक केलेली होती. पण लाऊड स्पीकरच मिळाला नाही. समुदाय पहावा तर गावोगावचे ७-८ हजारांवर स्त्री पुरुष मुले आलेली. गांधीजी जयजयकारात सभास्थानी आले. पंजाबरावांनी मानपत्र वाचले आणि प्रास्ताविक भाषण केले. कितीही मोठ्याने टास आवाजात बोलले, तरी ते ७-८ हजार लोकांना थोडेच नीटसे ऐकू जाणार? महात्माजी उठले. आधीच हवा कुंद. जमीन भिजलेली. बोललेले लोकांना ऐकूच जाई ना.
गांधीजी फक्त दहाच मिनिटे बोलले आणि "माझ्या हिंदीतल्या भाषणाचा मराठी सारांश आता ठाकरेजी आपल्याला सांगतील", असे म्हणून निघून गेले. मीही शक्य त्या टास आवाजात १५ मिनिटे बोललो. तेवढ्याने माझ्या आवाजाचे साफ खोबरे झाले. सभा संपली. अमृतकरांच्या घरी आलो. महात्माजी बसले होते. मला पहाताच त्यांनी हसण्याचा खोकाट केला. "कैसा किया. ठीक हुवा न? पूनेमे मेरेको ठाकरेजीने भाऊराव पाटीलके बारेमे इतना छेडा था, इतना छेडा था, बस कह नही सकता. आज मैने वो बातका पूरा बदला ले लिया." गांधीजी हसत हसत समोर बसलेल्या मंडळींना सांगत होते. मी म्हटले "महात्माजी. अहो, परवाची अकोल्याची हकिकत पण सांगा ना या मंडळींना तो मुद्दा उडविण्यासाठी ते अमृतकरांना चटकन म्हणाले "देखिये. ठाकरेजीने आज बहोत कष्ट उठाया है. उनको गरम गरम दूध देवो ना नानासाब." मी "मला दूध आवडत नाही. चहा आणा." यावर चहा बरा का दूध बरे यावर ते थोडेसे बोलले.
मध्यरात्रीलाच महात्माजी मोर्शीहून पुढे रवाना झाले. मी एक दिवस तेथेच अमृतकरांकडे राहिलो. दुसऱ्या दिवशी त्यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभेत एक व्याख्यान ठोकून नागपुराकडे रवाना झालो.
चलो फैजपूर
काँग्रेसचे अधिवेशन खेड्यात भरवावे, अशी म. गांधींच्या आतल्या आवाजाला फुरफुरी आली. मग हो काय ? गांधी बोले नि काँग्रेस हाले. त्यांनी फैजपूर हे खेडे पसंत केले. वास्तविक फैजपूर हे खेडे नाहीच बऱ्हाणपूर लायनीला भुसावळच्या पुढले सावदा स्टेशन, तेथून २ मैलांवर सावदा गाव आणि तेथून मैल दीड मैलावर फैजपूर काँग्रेसवाल्यांच्या साध्या करणीतही काहीतरी भरभक्कम लभ्यांशांचे धोरण असतेच असते. सावदा नि फैजपूर ही दोन गावे गडगंज श्रीमंत लेवा पाटीदारांनी गजबजलेली. गयावळ्या कॉंग्रेसवाल्यांनी अधिवेशनाच्या सबबीवर, त्यांच्या गजव्यांना चांगलेच गिरमिट लावले.
मला फैजपूरची चांगलीच माहिती होती. आम्ही वॉर्डनमन कोणीही काँग्रेसच्या प्रेमात चुकूनही पडलेलो नव्हतो पण वॉर्डन विमा कंपनीच्या प्रचारकार्याला ही काँग्रेसच्या गोचीडगर्दी मेळाव्याची संधी का दवडावी. सेक्रेटरी मांजरेकर नि मी ठरविले की फैजपूरला जायचे. लगेच मी कै. नाना महाजनांना पत्र लिहिले. "तुम्ही अगत्य या. आमचेकडे तुमची सर्व व्यवस्था आनंदाने ठेवू " असा जबाब येताच प्रथम मी फैजपूरला प्रयाण केले. मांजरेकर मागाहून आले.
फैजपूरची काँग्रेस नगरी तेथील नदीच्या काठावर सुमारे मैलाच्या परिसरात शेतात उभारलेली होती. नदीला पाणी मुळीच नव्हते. सारी माती नि वाळू बांबूच्या तट्ट्याचे शेकडो मांडव उभारले होते. पोस्ट नि तारखात्यानेही आपला खास प्रचंड सोयीस्कर मंडप उभारून, तेथे आपली तार टेलिफोनची यंत्रे उत्कृष्ट उभारली होती. तारेचे खांबही उभारले होते. नगरीच्या विस्तीर्ण अंतर्भागाशिवाय, बाहेरही लगतच अनेक हॉटेलवाल्यांनी आपापले मांडव थाटले होते. शिवाय प्रवेशद्वाराने आत जाताच, एक लांबलचक मोठी मंडपाची रांगही हाटेलांनी नि इतर कारखानदारांच्या दुकानांनी सजलेली होती. मंडप म्हणजे काय? तर तट्ट्यांनी ३ बाजू झालेल्या १० x १० चा गाळा. त्याचे भाडे ५० रुपये. याशिवाय, प्रदर्शनाचा बाजार, कॉंग्रेसचा भटारखाना, डेलिगेट पाहुण्यांसाठी बांधलेल्या मांडवांच्या चाळी, म. गांधी नि अध्यक्ष जवाहरलाल नेहरू याच्यासाठी विशेष सोयीचे मंडप, अशी व्यवस्था. सगळीकडे बिजलीच्या दिव्यांचे खांब उभारलेले. म्हटले, ही व्यवस्था ठीक आहे. पण कसली ठीक नि ठाक? दिवे चालू केले आणि पहातात तो काय ? प्रत्येक बल्बमध्ये उदबत्तीचा उजेड ! बऱ्हाणपूर व्यापारी डोक्याचे त्यांनी लगोलग पेट्रोमॅक्सच्या दिव्यांची रासच्या रास भाड्याने द्यायला आणली. आम्ही प्रदर्शन बाजाराच्या अगदी शेजारी पहिल्या नंबरची जागा भाड्याने घेतली. इतरांनी मिळाली त्या जागेत आपापला व्यवहार चालू केला. पण आम्ही पडलो ममईकर. नानांच्या संपूर्ण सहकाराने आम्ही आमचे दुकान पांढऱ्या चादरी वगैरे लावून नखरेल शृंगारले. आमच्या शेजारी होते सातारच्या पेढेवाल्याचे दुकान. त्यांच्याकडे दररोज ट्रक भरून सातारी पेढे, आंब्याची बरफी, चिवडा, दुधी नि बदामी हलव्याचा माल येत असे. आम्ही दोघांनी दुकानासमोर खांब पुरून पेट्रोमॅक्सचा दिवा लावला.
धनाजी नाना चौधरी
हे दुकानांची नि आल्यागेल्याची व्यवस्था ठेवणारे हापसर होते. माझी त्यांची जुनी ओळख. धना नाना पूर्वी पोलीस इन्स्पेक्टर होते. कॉग्रेसला यासाठी ब्रिटिशांची हडेलहप्पी गुंडगिरी बेफाम लोकांवर चालू असण्याच्या काळात. धना नानाजीने लोकांवर अनाठायी लाठीमार करण्याच्या आज्ञेचा शूरपणाने धिःकार केला आणि जागच्या जागी कमरेचा पट्टा सोडून वरिष्ठाच्या अंगावर फेकला. झक मारते तुमची नोकरी, असे म्हणून राजीनामा दिला आणि मुलाबाळांसह ते तडक दादरला येऊन राहिले. त्यावेळी मी प्लाझा गार्डनच्या समोरल्या कामाठ्याच्या चाळीत रहात असे. त्याच चाळीत ते उतरले होते. सोपानदेव चौधरींनी त्यांची माझी ओळख करून दिली, तीच आता फैजपूरला उपयोगी पडली. शिवाय त्यांचे बंधू, सिताराम नाना चौधरी, `आत्मोद्धार " साप्ताहिकाचे संपादक, यांचा नि माझा घरोबा तर फार जुना. " स्वयंसेवकांची फलटण शंकरराव देव या पंचधाऱ्या कमांडरकडे होती. प्रवेशद्वारातून आत जाताच एक भव्य मैदान तयार केले होते. त्या भोवती दुकानांचे मांडवच्या मांडव आणि धना नानांचे हापीस लोकांच्या तक्रारी तेथेच मिटवल्या जात असत.
अरे बापरे, काय ही लोकांची भीडगर्दी!
अधिवेशनापूर्वी ३-४ दिवस गांधीजी येऊन दाखल झाले. त्यांना पहाण्यासाठी खेडूती लोकांची एवढी प्रचंड गोचीडगर्दी व्हायची का त्या लोकांनाच रस्त्याने मुंगीच्या पावलाने चालावे लागे. गांधीजी दररोज अनेक ठिकाणी भेट द्यायला जायचे. त्यांच्या मागे लोकांचा लोंढा चिकटूनच असायचा. अंतर्भागातल्या हाटेलांत चपात्या, बटाट्याची सुकी ओली भाजी नि भजीच काय ती तयार व्हायची. चांगले घट्टेकट्टे लोक पोळ्या लाटायचे. कितीही माल तयार करा, लोकांचा लोंढा आलारे आला का तासाभरात दुकानाचा माल खलास. रात्रंदिवस बिचारे लाटालाटीची हमाली करायचे, पण ४-५ दिवसात त्यांनीही हात जोडले. बाहेरच्या बाजूला दक्षिणात्यांची दोनच सुसज्ज हाटेले होती. एक आपल्या मुंबईच्या तांबे महाशयाचे आणि दुसरे पुणेकरांचे..
तांब्यांचा तांब्या उपडा पडला
तांब्यांचा थाट नेहमीच आगळा. त्यांचे ते फर्निचर, त्या आकर्षक जाहिराती आणि टापटिपीचे सेवक, २५-३० खुर्च्या टेबले. दुकान चालू होताच जी आली म्हणता खेडुतांची धाड. सारी टेबले नि खुर्च्या गेल्या भरून आणि दुकानासमोरच्या उघड्या जागेत बसले सारे फतकल मारून. "ए भटा, मिरचीचे फव्वे हान, बटाट्याची भाजी हान, भज्ज्या हान." असा सारखा गलबला चालू झाला. एक लोंढा गेला का दुसरा आलाच. संध्याकाळपर्यंत तांब्यांचे दुकान सारे खाऊन फस्त. मुंबईहून कांदे बटाटे वगैरे मालाचा ट्रक येईल तेव्हा ना पुढच्या साऱ्या सोयी? तांब्यांनी दुकान बंद केले. मी त्यांना भेटलो, "काय काकासाहेब दुकान बंदसे केले. काका-काय करणार ? अहो, या भरमसाट खादीला तोंड द्यायचे कसे ? सारे पडले खेडूती लोक. त्यांनी कुठे पाह्यले आहेत असले जिन्नस, ते आपले खातच सुटले. शिवाय पैसेवसुलीची पंचाईत काही काही लेकाचे खा खा खायचे नि खुशाल निघून जायचे. आपण तर बुवा हात टेकले.
कॉंग्रेस भटारखाना असा होता
एक लांबलचक तट्ट्यानी शाकारलेली जागा, तेथे खोल चर खणले होते, त्यात मोठमोठी जाडजूड लाकडे जळणासाठी टाकलेली, चरावर मोठमोठे जाड लोखंडी पत्रे टाकलेले, दोन्ही बाजूला शंभरावर बाया पोळपाट लाटणे घेऊन कणकेच्या चपात्या लाटीत नि त्या पत्र्यावर टाकून भाजीत, भात, आमटी, भाजीचा कारखाना याच थाटात शेजारी चाललेला. दुपारी बारा वाजता एक मोठी घाट वाजली, का सारे डेलिगेट पाहुणे कार्यकारी महाशय भोजनगृहाकडे धावायचे आणि काँग्रेसचे नाव घेऊन, जे पुढ्यात वाढले जाई ते मुकाट्याने गिळायचे. सगळीकडे धुळीचा भरमसाट संचार. थंडीचे दिवस नि थंडीही इतकी कडाक्याची, का डेलिगेटांच्या बरोबर आलेल्या नखरेल महिलांच्या तोंडावर भारतातल्या सगळ्या नद्या महानद्यांनी ठाण मांडले. सगळ्यांचे चेहरेमोहरे एक दोन दिवसांतच पहाण्यासारखे झाले. कांग्रेसमध्ये घृतकल्या मधुकल्या खायला मिळेल या आशेने आलेल्या डेलिगेटांच्या नखऱ्यात गरम मसाला पडला.
वॉर्डन दुकानाचा थाट
भेटीला येणाऱ्या प्रत्येकाला आमच्या दुकानी बैठक मारल्याशिवाय जावेसेच वाटायचे नाही. इंदोरचे सरदार किबेसाहेब आणि सौ. लक्ष्मीबाई किबे हे जोडपे सकाळसंध्याकाळ बसायला यायचे. त्याशिवाय इतर अनेक ओळखीची मंडळीही येत असत. शेजारी सातारच्या पेढेवाल्याचे दुकान असल्यामुळे या पाहुण्यांचा आदरसत्कार आम्हांला झक्क करता यायचा. कित्येक ओळखीचे डलिगेट यायचे नि आमची स्पेशल सोय नाना महाजनांच्या वाड्यात झालेली ऐकून म्हणायचे, "आमचीही सोय लावा ना तिथे ? अहो, सहकुटुंब आलोय ना मी. हे कसले जीवन? ना नीट रहाण्याची भोजनाची सोय." मग आम्ही त्यांना चिठ्ठी देऊन गावात पाठवायचे आणि त्यांची सोयही व्हायची.
नाना महाजनांचे आदरातिथ्य
माझी आणि मांजरेकरांची सोय अगदी राजेशाही होती. झोपायला पलंग, मच्छरदाणी, चहा जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था, स्नानासाठी स्वतंत्र्य मोठी बाथरूम, दोन मोठाले बंब पाणी तापवायला, थंड पाण्याच्या चार तोट्या, शेजारच्या विहिरीला रहाट लावून बाथरूमवरच्या टाक्या भरगच्च भरलेल्या शिवाय, नाना महाजनांचा विलक्षण आग्रह. त्यांच्या दारासमोर कोणी का परका असामी येईना, त्याला नानांनी हाक मारून आत घेतलेच. बायका माणसांची खास व्यवस्था अशा रीतीने त्या कॉंग्रेसच्या हंगामात नानांच्या वाड्यात, मला वाटते. ५०-६० माणसाची सोय त्यांनी लावली. जेवणखाणाची व्यवस्था चोख.
व्याख्यानासाठी प्लाटफार्म हवा
आम्ही फैजपूरला गेलो त्याच्या दुसऱ्या दिवशी धना नाना माझ्याकडे दुकानात आले. "ठाकरेसाहेब, तुमच्या दुकानासमोर या मैदानात म. गांधीजींची व्याख्याने व्हायची आहेत. त्यासाठी प्लॉटफार्म उभारायचा आहे. काय करावे समजत नाही. त्यांच्याबरोबर ४०-५० मानकरी असणारच. सगळ्याची सोय होईल असा चौरंग मिळणार कुठे? बाके खुर्च्या तरी आणायच्या कुठून?" मी म्हटले, "थांबा, नाना महाजनांना विचारतो नि सांगतो.." मी गावात गेलो नि नानांना विचारले, नाना म्हणाले, "आहे. आमचा एक भला मोठा चौरंग आहे. २० फूट बाय २० फूट असा. हवा असला तर पाठवा लोक नि घेऊन जा. धना नानांना मी सांगितले. त्यांनी लगेच ७-८ स्वयंसेवक पाठवले. त्यांनी तो चौरंग पहाताच लेकांचे हबकले. परत गेले नि ४० लोक घेऊन आले. अडचणीच्या जागेतून तो काढला नि कण्हत कुंथत घेऊन गेले. छान व्यवस्था झाली. व्याख्याने ऐकायला आमच्या दुकानात प्रतिष्ठितांची गर्दी व्हायची.
जवाहरलालांचे आगमन नि गर्दी
काँग्रेसनगरीचे महाद्वार नदीच्या बाजूला होते. अर्थात जवाहरलाल नेहरूंची मिरवणूक सावद्याहून येणार ती त्याच वाटेने, या समजुतीने नदीच्या पात्रात प्रचंड गर्दी झाली. सावद्याहून येणान्या स्टँडवर येताच येईना. पुण्या-मुंबईहून अनेक पोलीस इन्स्पेक्टर आले होते. ते सारे माझ्या ओळखीचे होते. या प्रचंड गर्दीचा ददोबस्त करावा कसा या विवंचनेत ते पडले. इतक्यात मी आलो. गर्दी सारखी वाढतेच आहे. मी डोके लढविले. पोलिसांना सांगितले, "ओरडून पुकारा करा, जवाहरलाल या रस्त्याने येत नाहीत, ते सावद्याकडच्या बाजूने आत जाणार आहेत. तिकडे सगळ्यांनी जावे." बस्स, मात्रा लागू पडली. आणि खरोखरच तसे घडलेही, मग हो काय ? सारा प्रचंड ओघ धावत पळत त्या बाजूला गेला.
फैजपूर नंतर इंदोर देवास
वॉर्डन विमा कंपनीने एक नवी विमायोजना काढली. सर्वसाधारण मंजूर कामगारांनी दर महिना आठ आणे ते एक रुपया हप्ता भरून पॉलिसी घेतल्यास, त्याच्या मृत्यूनंतर वारसाला रोख एक हजार रुपये मिळतील. ती योजना घेऊन मी इंदोर देवासकडे जाण्याचे ठरविले. तो मे महिना होता. मध्य- हिंदुस्थानचा कडक उन्हाळा नि रणरणते ऊन्ह बाहेर पाहूच देईना. इंदोरला उतरलो.
टांगे निघाले, देवासला गेल्यावर उत्तरायचे कुठे नि कुणाकडे ? विचारयंत्र चालू झाले. चिरपरिचयाचा माझा एकच मित्र तेथे होता. डॉ. आनंदराव अमृतराव बाबर. त्याच्या घरी तरी सोय होईल का? न झाली तर हाटेल बिटेल तरी आढळेल का? नाना विचार. क्षिप्रा नदीतली देवळे दिसू लागली. पहातो तो टांगे क्षिप्रेवर बांधलेल्या नव्या पुलावरून धावू लागले. पहिल्यासारखे नदीच्या पात्रातून नव्हे.
झाले. देवास आले. रात्रीचे आठ वाजले. अड्डयावर टांगे थांबले. टांगेवाल्याजवळ मी डॉ. बाबरचा पत्ता विचारला. थोडीशी इकडे तिकडे चौकशी केल्यावर समजले की कै. मल्हारराव बाबासाहेबांचे धाकटे बंधू खासेराव महाराज यांनी वडील भावाच्या सन्मानार्थ ‘मल्हार प्रदर्शिनी` नावाची एक वार्षिक जत्रा भरविण्याची प्रथा चालू केली आहे. तेथे सबंध हिंदुस्थानातून शेकडो व्यापाऱ्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. खुद्द खासेसाहेब महाराज सहकुटुंब रात्री १२ वाजेपर्यंत तेथे फिरत असतात. अर्थात त्यांचे सर्व कारभारी वगैरे त्यांच्याबरोबरच असतात. डॉ. बाबरही प्रदर्शिनीतच सापडतील. मी टांगा तेथे नेला टांगेवाला आत गेला नि त्याने डॉ. बाबरला गाठून मी आल्याचे सांगितले. तो लगोलग बाहेर आला नि मला आत घेऊन गेला. माझे बॅग बेडिंग तेथल्या चौकीदाराजवळ ठेवले.
राजाश्रयाची दिलदारी
डॉ. बाबरच्या बरोबर प्रदर्शिनीच्या आत जातो. तोच समोरून खासेसाहेब महाराज आपल्या सेवकांसह प्रदर्शिनीचा थाटमाट न्याहाळीत येत असताना दिसले. डॉ. बाबरने मी आल्याचे सांगितले. मी जवळ गेलो नि मुजरा केला. "या या ठाकरे साहेब या. केव्हा आलात? ठाकरेसाहेब, आपण अगदी योग्य वेळी आलात. बरे, जेवणखाण व्हायचे असेलच. गुलाबराव, यांना ताबडतोब समर्थ बंगल्यावर घेऊन जा आणि यांची सगळी सरबराई नीट ठेवा." हूकूम सुटला. समर्थ बंगला म्हणजे मागे १९२० साली आलो होतो तो कै. बाळासाहेब समर्थांचा बंगला. तो आता संस्थानच्या बड्या पाहुण्यांसाठी `गेस्ट हाऊस` बनला होता. टांगा तयार होताच. लगेच मी आणि गुलाबराव समर्थ बंगल्यात गेलो तेथला थाट काय सांगावा ? प्रत्येकाला खोली निराळी व्यवस्थित बिछाना गिरद्यांसह कॉट. दहाबारा कामाठी (कामकरी) सेवेला हजर जे हवे ते मागा, ताबडतोब तयार. मी प्रथम गरम पाण्याने आंघोळ केली. पोटभर जेवलो नि कपड़े बदलून चालत प्रदर्शिनीकडे गेलो. ती एका हाकेवरच होती प्रदर्शिनीच्या यथातथ्य माहितीचा मी एक लेखच पुण्याच्या ज्ञानप्रकाशात छापला होता. देवासला माझा पंधरवडाभर मुक्काम होता. दररोज सकाळी ८-९ वाजता राजवाड्यात आणि रात्री प्रदर्शिनीत मी खासराव महाराजांना भेटत बोलत असे. आमची विमा योजना हा भाषणाचा मुख्य धागा. तो अनेक हापसरांना नि खात्यांच्या अधिकाऱ्यांना एकेकटे गाठून सांगण्याची प्रदर्शिनी हीच जागा पुष्कळांच्या ओळखी झाल्या.
आमची महामाया चेकाळली !
सुमारे ३-४ दिवसांनी गेस्ट हाऊसचा चमचमीत पाहुणचार घेत असताना आमची महामाया चेकाळली कॉटवर निपचित पडलो. बातमी राजवाड्यात पोहचली. खासेसाहेब तात्काळ आले नि म्हणाले, “अहो, सगळ्या हिंदुस्थानातून मूळव्याधीचे रामबाण ऑपरेशन करून शेकडो लोक ज्याच्याकडे येतात, ते डॉ. रॉबिन्सन तर आमच्या संस्थानच्या दवाखान्यात आहेत. तिकडे तुम्हाला नेण्याची व्यवस्था करतो " लगेच आमची स्वारी सरकारी मोटारीतून दवाखान्यात हजर झाली. रॉबिन्सनने तपासले नि चारपाच ठिकाणी इंजेक्शने दिली. ८ दिवस डाळभाताची खिचडी खायची आणि एक औषध सांगितले, त्याचे दोन मोठाले चमचे पाण्यातून घ्यायचे पडून राह्यचे झाले. आम्ही कॉटबंध पडलो बाकीचे लेकाचे मोठमोठे पाहुणे सकाळ, दुपार, संध्याकाळ नि रात्रीही निरनिराळे पदार्थ चमचमीत बकलायचे आणि मला डाळखिचडी
लेखनाने माझी पाठ सोडली नाही
पाय वर करून कॉटवर पडलो, तरी लेखनाने माझी पाठ सोडली नाही. दादरचा सगळा पत्रव्यवहार माझ्याकडे रवाना व्हायचा त्यातच एक तार आणि पत्र कोल्हापूरच्या सत्यवादीकार पाटलाचे. त्यावेळी व्ही. शांतारामचा ‘तुकाराम’ ‘लोकमान्यतेच्या अगदी शिखरावर चढला होता. सत्यवादीकारांनी तुकाराम महाराजांच्या चरित्राच्या विविध पैलूंवर निरनिराळ्या नामांकित लेखकांचे लेख मागविले होते. पडल्या पडल्या मी एक लेख लिहिला. तुकारामाचा मत्सर करणाऱ्या भटांनी त्याला इंद्रायणीत बुडविले, असा मजकूर लेख दिला पाठवून तो सत्यवादीच्या खास अंकात छापला गेला नि त्या खास अंकाचे उद्घाटन पुण्याच्या भारत सेवक समाजाच्या इमारतीत मोठ्या थाटामाटाने साजरे करण्यात आले. बातमी समजली की जो तो कटाक्षाने माझ्या लेखाचा संदर्भ एकमेकाला दाखवीत होता. त्यानंतर एल्बी भोपटकर यांनी त्यावर लेखी वाद माजवला आणि मीही त्यांना ज्ञानप्रकाशातून सणसणीत उत्तरे देत गेलो..
बड्या पातीच्या महाराजांची भेट
छोट्या पातीच्या खासराव महाराजांना आणि विधान सभेच्या अध्यक्षांना वरचेवर भेटून, कामगार विमा योजनेचा हेतू मी मार्गाला लावलाच होता. आता बड्या पातीचे तरुण महाराज विक्रमसिंग (सध्याचे करवीरचे संस्थानिक शहाजीराजे भोसले) यांना भेटून, त्याच्या दरबारी कारवाईचे सूतोवाच करावे. म्हणून त्यांना मी जासूदाबरोबर एक पत्र पाठवून भेट मुक्रर केली. दुसरे दिवशी सकाळी ९ ची अपाइटमेंट, टांगा केला नि नव्या राजवाड्यावर त्यांच्या मुक्कामी गेलो. आत गेलो. ओटीवरच एका सभ्याने स्वागत केले. आपण काल पत्र पाठवले होते ना? होय बसा थोडा वेळ इथे. महाराज आत्ताच येतील. दहाएक मिनिटांनी माझ्या समोर दिला पायजमा, ढिला सदरा घातलेला एक तरूण येऊन उभा राहिला. नमस्कार चमत्कार झाले. `आपली योजना काल रात्री मी वाचली. आमच्या दरबारी अधिकाऱ्यांना आपण भेटावे. ते विचार करतील, असा मला भरवसा वाटतो." नंतर आमच्या इथली जुनी मंडळी कधीकधी भेटतात, तेव्हा आपले नाव निघाल्यास, जुन्या आठवणी सांगतात, होय सरकार, सन १८९२ सालापासून माझा नि देवासचा ऋणानुबंध आहे. माझे मामा के. राजारामपंत गडकरी आपले आजोबा कृष्णराव बाबासाहेब पवार यांचे दरबारी वकील होते. "इत्यादी गप्पाटप्पा झाल्यावर मी त्यांची रजा घेतली.
वॉर्डनचे उड्डाण नि माझे बुडाण !
वॉर्डन विमा कंपनी ही मूळची अहमदाबादची. म्हणजे धाडसी गुजराती बेपाऱ्यांची. मुंबईची शाखा श्री. मांजरेकर, सेक्रेटरी नात्याने चालवीत होते. अर्थातच त्यांनी आपला सारा संच मऱ्हाठ्यांचा ठेवला होता. सुरुवातीला या शाखेची कचेरी हॉर्नबी रोडवर केम्प कंपनीच्या थेट तिसऱ्या माळ्यावर होती. येथे दिवसा मनस्वी काळोख. इतका की बिजलीचे दिवे सर्वत्र लखाखल्याशिवाय कोणालाच काही दिसायचे नाही. जागा चिंचोळी लंबायमान. मी सामील झालो तेव्हा उन्हाळ्यातही पंखे नव्हते. मी तक्रार केल्यावरून पंखे आले. मुंबई शाखेचा बिझिनेस वाढल्यामुळे, अहमदाबादी गुजरात्यांनी तेथले हेड ऑफीस मुंबईला आणण्याचा बूट रचला. फेरोजशा मेहता रोडवर वॉर्डन हाऊस बांधण्याचे काम सुरू झाले नि आमची जुनी कचेरी तेथेच जवळच्या एका बिल्डिंगमध्ये हालविण्यात आली. ही जागा छान अद्यावत होती.
वर्षभरात वॉर्डन हाऊस उभारले गेले माथा मजल्यावर वॉर्डन कंपनीचे हेड हापीस थाटले गेले. एजन्सी हापसर म्हणून अय्यर हा मद्रासी लडधू नेमण्यात आला. मांजरेकरांचा पगार दामदुप्पट झाला. माझ्या पगाराबद्दल चकार शब्द कोणी काढीना ! सन १९२२ पासून माझ्या उजव्या हाताला अपघातामुळे लिहिणे कायमचे वर्ज झाले होते. फक्त टायपिंग जमायचे, बरे. सारा इंग्रेजी पत्रव्यवहाराचा बोजा माझ्या शिरावर. कंपनीत टाइपरायटरही नव्हता नि कोणी टायपिस्टही नेमलेला नव्हता, म्हणून केवळ माझ्या सोयीसाठी. मी माझा घरचा ऑलिव्हर आम्ही जुन्या जागेत होतो तेव्हाच कचेरीत वापरायला नेला. त्या अय्यरला वाटले का मी हापीसचा टायपिस्ट आहे. शिवाय मी शॉर्टहॅण्डमध्येही प्रवीण होतो, पण हातच लंजूर झाल्यायर त्या कलेचा उपयोग काय? त्या लेकाच्या अय्यरने मला दोन तीन वेळा पत्र टायपाला सांगितली. जण्टलमन म्हणून मी टायपून दिली. तो सेंवकला नि रोज पत्रे देऊ लागला. मी त्याला म्हटले, "अहो राजश्री, तुमची कामे करायला मी बांधला गेलेला नाही. हवे तर तुमच्यासाठी खास टायपिस्ट नि टाइपरायटर घ्या मागून मॅनेजराकडून" त्याचा माझा खूपच कडाक्याचा वाद झाला.
पुढे थोड्याच दिवसांनी वॉर्डन हाऊसची शांती नि घरभरणी यथासांग साजरी करण्यात आली. नंतर शेकडो पाहुण्यांना बोलावून सभा, अभिनंदने, स्मरणिकांचे वाटप आणि अल्पोपहाराची मेजवानी वगैरे घाट झाला, सफोटो स्मरणिकेत, सिस्टा अॅडव्हटाइझीन्गच्या सिस्टाने माझ्या अनेक फोटोना विशेष प्राधान्य दिलेले होते.
उत्सव संपल्यावर मांजरेकराला मी विचारले, "काय हो, तुमचा पगार घेतलात तुम्ही वाढवून आणि मी काय सववाशेके सव्वाशेच करीत बसू? तुम्ही तर नेहमी म्हणत होतात की अहो हे अहमदाबादी गुजराती मी सर्कशीतल्या घोड्यासारखे खेळवीत आहे. मग आता हे असे का? विचार करा मला हे परवडणार नाही. "खूपच बोलणे झाले. मांजरेकर जात्या शांत स्वभावाचा माझ्या सवालाला समोर येऊन जाबच कोणी देईना. तेव्हा एक दिवस फिरले ठाकरी डोके! कंपनीत त्यावेळी चेअरमन भास्करराव जाधव आले होते. त्यांच्या समक्ष सगळ्या उच्चाधिकारी गणगांचा उद्धार करीत मी वॉर्डनची पायरी उतरलो.
हम कभीबी बेकार नही रहा
ज्याच्या अंगात हुन्नर आहे. हिंमत आहे, जिद्द आहे आणि स्वाभिमान आहे. असा माणूस केव्हाही बेरोजगारी आढळायचाच नाही. हा माझ्या जीवनाचा साक्षात्कार आहे. सिद्धान्त आहे. वॉर्डनला लाथ मारून बाहेर पडल्यावर एक दोन विमा कंपनीची इंग्रेजी. मराठी प्रास्पेक्टसे लिहून दिली ४-५ शे रुपये कमाई झाली बस्स, २-३ महिन्यांची सोय झाली.
"कई बिजिनीश आव्या के?"
माझे जीवस्य कण्ठस्य स्नेही के केशवराव बाळकृष्ण वैद्य हे एक मोठे विद्वान नि धाडसी पत्रकार होते. ते चीनमध्ये तब्बल १२ वर्षे तेथली इंग्रेजी वृत्तपत्रे चालवीत होते. शिवाय काही व्यापाऱ्याच्या अडतीचाही कारभार पहात असत. व्यापारी वर्गात त्यांचा बोज मोठा, काही वर्षे तर ते नरोत्तम मोरारजीचे प्रायव्हेट सेक्रेटरी होते. ज्योतिष शास्त्रातही केशवराव फार प्रवीण होते, त्यांचा नि माझ्या कुटुंबाचा घनिष्ट संबंध.
जळगावच्या ग्रेट सोशल विमा कंपनीचे डबरे वाजू लागले होते. ते मुंबईच्या काही गुजराती व्यापाऱ्यांनी फाजील हिमतीने वाजवायला हाती घेतले नि केशवराव वैद्यांना मॅनेजरकीचा अभिषेक केला. केशवरावने मला निमंत्रन एजन्सी सुपरदंट नेमले, धन मॅन्शनमध्ये हापीस थाटले. सगळा स्टाफ-काही जुना काही नवा भरला. आम्हांला पेशल केबिन दिली. हा वरचा मुलामा तर छान बसला. पण खुद्द कंपनीच्या गावोगावच्या एजंटांची अवस्था मात्र फारच नासलेली. अनेकांनी कंपनीला हजारो रुपयांना गंडविलेले. नवीन एजंट तर कंपनीचे `ग्रेट सोशल’ नाव ऐकताच कोपरापासून हात जोडीत असत. मी सगळ्या एजंटाच्या फायल्या तपासल्या आणि त्यावर एक लांबलचक रिपोर्ट मॅनेजरला दिला. माझ्याशिवाय आणखी एक गुजराती गृहस्थ एजन्सी मॅनेजर म्हणून नेमला होता. का? तर म्हणे एका विमा कंपनीला लाख्खो रुपयांचा बिझिनेस त्याने मिळवून दिला होता. मी तेथे तीन महिने समोर येईल ते काम पाहिले. पण गुजराती मालकांपैकी एक तरुण ढेरपोट्या दररोज माझ्या केबिनमध्ये यायचा नि के बिजनीश आव्या के ? म्हणून दात विचकीत विचारायचा. मला चीड यायची. लेकाचे मेलेल्या घोड्यावर जरतारी जीन चढवून निघाले आहेत तुबक्तूच्या स्वारीला नि मला विचारताहेत के बिजनीश आव्या के? मी कंपनीला रामराम ठोकला. ३५० रुपये पगार मिळतो म्हणून निष्क्रियासारखे कुजत रहाणे, माझ्या स्वभावाला मानवणारे नाही.
`यू कम डिरेक्ट हिअर"
ग्रेट सोशलचा राजीनामा देऊन मी बाहेर पडत असतानाच मला एक फोन आला तो होता `हौ डुयुडू’ थाटाचा पण मी राजीनामा देऊन घरी जात आहे. असा जबाब दिला. त्या गुजराती तरुणाने (त्यांचे नाव मपारा) "छे छे घरी जाण्यापूर्वी मला येऊन भेट. तुझ्यासाठी इथ खुर्ची रिकामी आहे” असे सांगितले मी गेलो नि त्याला भेटलो मपारा आणि त्याची तरुण पत्नी दोघेही ग्रॅज्वेट. यावेळी ते गिरण्या, फॅक्टऱ्या नि मुन्सिपालट्यांना काही विशिष्ट माल पुरविण्याचा व्यापार करीत असत.
यांची माझी सांगड अशी जमली त्याचे हापीस लक्ष्मी बिल्डिंगमध्ये असताना, ते जाहिरातीचा धंदा करीत. मुंबई शहरात नाक्यानाक्यावर मोठमोठ्या इमारतीच्या भिंती भाडयाने घेऊन, त्यावर अनेक कंपन्यांचे मोठमोठे बोर्ड लावीत असत. त्यांचे जी. आय. पी. रेल्वेकडे मोठ्या रकमेचे डिपाझिट अडकले होते. त्यांनी पुष्कळ पत्रव्यवहार केला, पण रेल्वेचा अधिकारी ताकास तूर लागू येईना, मपाराने ही हकिकत मला सांगितली नि तू तरी मला यावर उपाय सांग म्हणून विनवले. मी फाईल मागितली नि घरी जाऊन तिचा अभ्यास केला. सकाळी पत्राचा एक ड्राफ्ट टाइप केला नि त्याच्याकडे पाठवला. त्याने तो रेल्वे हापसराकडे पाठवला आणि काय आश्चर्य ! १५ मिनिटात त्याचा फोन आला की " अरे बाबा, हा मुद्दा प्रथमच का नाही कळवलास मला? चल दे पाठवून तुझा शिपाई, त्याला देतो मी फुल पेमेण्ट चेक, या एका घटनेपासून मपारा माझा अगदी भक्त बनला म्हणूनच त्याने मला ताबडतोब भेटायला बोलावले आणि सांगितले, "आजपासून तू माझा सारा पत्रव्यवहार करीत जा, पगार रु. ४००." दुसऱ्या दिवशी तेथे रुजू झालो यावेळी त्याचे बिऱ्हाड नि हापीस गिरगावात नायर हास्पिटलच्या समोर होते.
मि. जे. बी. एच. वाडियांची भेट
कशी झाली, ते थोडक्यात सांगतो. मपाराकडे महिनाभर काम केले. एक दिवस तो म्हणाला. हे बघा ठाकरे, वाडिया मूविटोनचे वाडियाशेट, खरे पाहिले तर माझे अगदी बूझम फ्रेंड, पण गेल्या बऱ्याच महिन्यांत ते मला अगदीच विसरून गेलेले दिसतात, नुकतेच एक दोन संमेलनात ते मला दिसले, पण माझ्याकडे पाहिले न पाहिलेसे त्यांनी केले. तेव्हा त्यांना एक छान पत्र लिहा की त्यांची माझी दोस्ती पुन्हा होईल." मी पत्र तयार केले आणि मपाराने सही करून पाठवले. आश्चर्य असे की नेमके दुसऱ्याच दिवशी मिस्टर आणि मिसेस वाडिया मपाराच्या भेटीला आले. दिलजमाईच्या गप्पा झाल्यावर, वाडियाने विचारले, "या पत्राचा ड्राफ्ट कोणी लिहिला ? तू ग्राज्येट खरा, पण हा ड्राफ्ट खास तुझा नव्हे." मपाराने माझी ओळख करून दिली. १०-१५ मिनिटे वाडियांनी माझी चौकशी केली आणि मपाराला सांगितले. " हे बघ हा माणूस मला हवा. अशाच माणसाच्या शोधात मी होतो." दोघांची खूप भवति न भवति झाली आणि अखेर ठरले की मी वाडिया मूविटोनच्या जाहिरात विभागात सकाळी दहा ते दीड वाजेतोवर काम करावे नि पुढे मपाराच्या कचेरीत जावे. अर्धा पगार इकडे नि अर्धा पगार तिकडे.
वाडिया भूविटोनचा परिसर
वारसदारीने मूविटोनचा प्रचंड संसार वाडियाशेटनी आपल्या विशाल लवजी कॅसलमध्ये थाटला होता. सातारा राजकारणातील रंगो बापूजी विलायतेहून मुंबईला आल्यावर मुंबई सरकारने त्याच्या वास्तव्यासाठी ठरविलेला हाच तो लवजी कॅसल. सभोवार विस्तीर्ण परिसर पसरलेला. वाडियाकडे मी गेलो, तेव्हा लवजी कॅसलमध्येच गेलो.
जहांगीर वाडियाची उदारमनस्कता
याच सुमाराला व्ही. शांताराम प्रभातला रामराम ठोकून खुद्द मुंबईलाच सेण्ट्रल स्टूडिओ विकत घेण्याच्या खटपटीत होते. अनेक दिवस वाटाघाटी होऊन, सेण्ट्रलच्या मालकांनी नकार दिला. शांतारामजी निराश होऊन पुण्याला परत जाणार होते. वाडियाशेटला ही बातमी रात्री १० वाजता समजली. त्यांनी ताबडतोब शांतारामना फोन केला नि सकाळी भेटायला बोलावले. भेट होताच म्हणाले, शांतारामजी, तुमच्यासारख्या कलावंताला मुंबईसारख्या शहरात स्टूडिओ मिळू नये, ही फार खेदाची गोष्ट आहे. चला आणा तुमचा सिनेसंसार येथे. हा लवजी कॅसल नि त्याचा सारा परिसर आज मी तुम्हाला दिला आहे. माझा सिनेसंसार चालवीन एका भागात. तेव्हापासून व्ही. शांतारामच्या राजकमल चित्र मंदिराचा संसार परळच्या लवजी कॅसलमध्ये चालू झाला.
खाजगी जीवनाला किंचित स्पर्श
गेली नऊ दहा वर्षे मी जीवनगाथा लिहीत आहे. पण त्यात चूकूनही मी माझ्या खासगी संसाराची कथा अथवा व्यथा कधी लिहिली नाही. पण आज लिहिणे क्रमप्राप्त आहे. मपाराला मी माझा स्नेही शांताराम ताम्हणे दिला नि मी कायमचा वाडिया मूविटोनचा पब्लिसिटी ऑफिसर म्हणून काम पाहू लागलो. अचानक माझी पत्नी सौ. रमा आजारी पडली. त्यापूर्वी तिला कधीमधी पोटदुखीचा आजार व्हायचा, शेजारचे डॉ. कानिटकर यायचे नि मॉरफियाचे इंजेक्शन देऊन जायचे. ऑफिसातून परतल्यावर ती मला ही कहाणी सांगायची. पण आता मात्र दररोज तिला ताप येऊ लागला. म्हणून कामा इस्पितळात तिची रवानगी केली. कारण तेथे माझ्या ओळखीची एक सिस्टर होती. तेथे निर्णय दिला की यांना टीबीचा आजार आहे. मी हॉस्पिटलचा नियम झुगारून तिला घरी आणली आणि कै. बाबूराव बेंद्रे यांच्या होमिओपथिक ट्रीटमेंटखाली ठेवली. कारण सौ. रमाचा विश्वास डॉ. बेंद्रे यांजवर फार. ती दिवसेन दिवस खंगत गेली. डॉ. वाड आले. फी घेऊन गेले. डॉ. कोहियार आले. तोच प्रकार शेजारचे डॉ. मुणगेकर त्यांच्या प्रिस्क्रिप्शनप्रमाणे औषधोपचार करीत होते. आजाराच्या या दोन वर्षात मी नोकरी सांभाळून सिनेकथा लिहिण्याचे काम करीत होतो. माझ्या आयुष्यात पत्नीच्या आजाराची दोन वर्षे फार कष्टमय गेली. आयुष्यात पत्नीच्या आजाराधी दोन वर्ष फार कष्टमय गेली.
आफिसातून येताना खोदादाद सर्कलवर उतरायचे नि रत्तलभर मिठाईचा पुडा घेऊन घरी येताच मुलांना मिठाई वाटायची. त्यांचा आनंद हाच मला किंचित विरंगुळा होता. आजार भलताच जोरावला. म्हणून आयुर्वेदिक तज्ञांचा औषधोपचार चालू केला. एक दिवस तोही लेकाचा बाहेरगावी निघून गेला. अखेर पत्नीच्या पायांना सूज आली. औषधोपचाराची एकही पथि शिल्लक राहिली नाही. अखेर शेजारीच रहाणाऱ्या काशीबाई नवरंगे या वृद्ध अनुभवी डॉक्टरला बोलावले. तिने प्रकृती पाहिली नि म्हणाली "अहो या बाईच्या पोटात कॅन्सर आहे नि हे सारे डॉक्टर लोक टीबी काय करीत बसले आहेत पोट का दुखत असे. याचा आज उलगडा झाला पण उपयोग काय? दुसऱ्या दिवशीच लहान लहान मुलांचा परिवार माझ्या गळयात टाकून सौ. रमा देवलोकी निघून गेली
और्ध्वदेहिक विधी मी काहीच केले नाहीत. माझा त्यावर विश्वास नाही. आम्ही सुतकही पाळले नाही फक्त ११ व्या दिवशी सगळ्या नातेवाइकांना सकाळी ९ चे आमंत्रण दिले. वे. शा. सं. पालशास्त्री यांना बोलावले त्यांना त्यांच्या आसनावर बसवले आणि प्रसंगानुरूप प्रवचन करायला सांगितले त्यांनी उपनिषदातील नचिकेत चरित्रावर एक तास सुश्राव्य प्रवचन दिले. नंतर मी सगळ्या नातलगांच्या हाती एकेक चांदीची पावली दिली आणि प्रत्येकाने ती शास्त्रीबुवाजवळच्या पाण्यात भिजवून तेथल्याच तुळशीपत्रासह पोथीला पहावी, असे सांगितले. नंतर चहापान होऊन समारंभ आटोपला. त्यानंतर वर्षश्राद्ध नाही नि काही नाही. सध्या माझी सून चि. सौ. मीना (चि बाळासाहेबाची पत्नी) माझी आजी, आई यांच्या फोटोसमवेत के सौ. रमाचीही प्रतिमा ठेवून त्यांची भक्तिभावाने पूजा करीत असते.
शिवराज्याभिषेकोत्सवाची जबाबदारी
अचानक गळ्यात पडली दोघेतिथे तरूण भेटायला आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा कसलाच उत्सव दादरला होत नाही. तो चालू करावा. या उद्देशाने काही मंडळी आम्ही बोलावली आहेत. आपण अगत्य यावे रात्री ८ वाजता लादीवाले जोशींच्या वाडीत माडीवर काही मंडळी जमली. डॉ. आजगावकर यांनी माझे नाव अध्यक्षपदासाठी सुचविले. येथेच प्रथम मला राष्ट्रीय स्वयंसेवकाची ओळख झाली. त्यांची शिस्त, संयम आणि आज्ञाधारकपणा फार वाखाणण्यासारखा. शिवमहोत्सवाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मला सर्वश्रेष्ठ नेतृत्व अर्पण केले. संघातील अनेक स्थानिक मोठमोठे कार्यकर्ते माझ्या परिचयाच्या क्षेत्रात आले. मीही संघेतर शेकडो लोकांना आमच्या सहकारात आणले. ३-४ वर्षे जूनच्या पहिल्या आठवड्यात आम्ही शिवराज्याभिषेकोत्सव अतिशय थाटामाटाने दादरला साजरा केला. शिवरायाची शहरातून मिरवणूक, नंतर जाहीर सभा. महाराष्ट्रातले अनेक नामांकित वक्ते भाषणाला आणले. या चळवळीतून पुढे शिवाजी पार्कमध्ये छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा बूट निघाला. तत्कालीन सारे मराठी मंत्री, मोठमोठे अधिकारी, व्यापारी, आमदार, खासदार, नामांकित नागरिक इत्यादीची एक जबरदस्त कमिटी निर्माण केली. महापालिकेशी पत्रव्यवहार करून शिवाजी पार्कात जागा मिळवली. प्रचाराच्या नि देणग्या मिळविण्याच्या जाहीर सभा जागोजाग गर्जू लागल्या. सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत मी याच कार्यात गुंतलेला असे. रा. स्व. संघातली सगळी स्वयंसेवक सेना माझ्या दिमतीला हिरिरीने सज्ज असायची. बारीकसारीक तपशील देणे आता कठीण आहे. पण आम्ही अंदाजे १३-१४ हजारांचा फंड जमविला. हे कार्य अगदी रंगात येत असतानाच, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला प्रारंभ झाला. मी त्यात धडाडीने भाग घेतला. या प्रचंड घुसळणीच्या तुफानात पुतळा समितीचे कार्य अर्थातच मागे पडले. मलाही प्रिवेंटिव डिटेन्शनखाली अटक झाली. अखेर चार्टर्ड अकाउंटंटकडून समितीचे सारे हिशोब तपासून घेतले आणि महाराष्ट्र बँकेतला अंदाजे १० हजारांचा हिशोब श्री यशवंतराव चव्हाणांच्या हवाली करून, मी मोकळा झालो.
डॉ. आंबेडकरांची शेवटची सभा
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालविण्यासाठी, आपापली ध्येये बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकवट व्हावे, या कल्पनेने डॉ. आंबेडकर अगदी पछाडले होते. दिल्लीहून ते मुंबईला आले नि बॅ. समर्थ यांच्याकडे चर्चगेटवरील लव्ह कोर्ट बंगल्यात उतरले त्यांनी मला ३-४ वेळा फोन केले, पण मी सारखा व्याख्यानांच्या भटकंतीवर असल्यामुळे ते मला मिळाले नाहीत. अखेर त्यांनी माझे शेजारी श्री.चंद्रकात भुलेस्कर यांना निरोप पाठवून मला घेऊन यायला आग्रहाचा निरोप दिला. आम्ही दोघे लव्ह कोर्टवर गेलो. डॉक्टर गव्हर्नरच्या भेटीला गेले होते. तेथे अर्धा तास थांबलो. इतक्यात डॉक्टर शिंदे (त्याचे मेडिकल आफिसर) आणि पत्नी यांनी त्यांना सांभाळून लिफ्टमधून दिवाणखान्यात आणले. ते कोचावर बसले. बसले म्हणण्यापेक्षा त्यांना बसवले, पाय काम देत नव्हते. बसल्यावर जवळजवळ दहा मिनिटे ते नुसते श्वास सोडीत आमच्याकडे टक लावून पहातच होते. त्याच वेळी मला वाटले की डॉक्टर फार दिवस काढण्याच्या अवस्थेत दिसत नाही. नुसता लाळागोळा ! दहा मिनिटांनी त्यांनी बोलण्याचा यत्न केला. मी डॉक्टर, काय तुमची ही अवस्था डॉ. अखेरच्या प्रयाणाची चिन्हे आहेत ही. नंतर आम्ही अनेक विषयांवर बोलत होतो. डॉक्टर म्हणाले, " हे पहा ठाकरे, सध्या निरनिराळ्या पक्षांतून विस्तव जाईनासा झाला आहे. अशा अवस्थेत हे मतलबी काँग्रेसवाले तुम्हांला संयुक्त महाराष्ट्र चुकूनही देणार नाहीत. आपापल्या ध्येयांची गाठोडी खुंटीला टांगून सगळे पक्ष एकवटतील, तर त्यात माझा शेडूल्ड क्लास अगत्य भाग घेईल. माझा शेडूल्ड क्लास जिब्राल्टरसारखा तुमच्या पाठीशी उभा राहील." मी मी हे जाहीर करू का ? डॉ.अगत्य करा. डॉ. आंबेडकरांची ही मुलाखत मी प्रसिद्ध केली नि त्याचा परिणाम अनुकूल झाला, सारे पक्ष समितीत एकवटले.
सगळेच लेकाचे मुखवटेवाले
माझ्या जीवनातील अखेरचा आणि अटीतटीचा संघर्ष म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा. याचा विस्तृत इतिहास माझे स्नेही श्री. लालजी पेंडसे यांनी महत् परिश्रमाने लिहिलेल्या महाराष्ट्राचे महामंथन या प्रचंड ग्रंथात जिज्ञासूनी पहावा. चळवळीपूर्वी महाराष्ट्रातले सगळे राजकीय पक्ष अगदी मरगळलेले होते. डॉ. आंबेडकरांच्या सूचनेप्रमाणे सगळे पक्ष एकजूट एकवटण्याचा प्रयोग जेव्हा पुण्यात चालू होता, तेव्हा मी जाहीर केले की असे होत असेल तर या एकमुखी संघटनेच्या द्वारावर मी छडीदार मालदार म्हणून उभा रहायला तयार आहे.`
सगळ्यांच्या एकवटणीने संयुक्त महाराष्ट्र समितीची चळवळ चालू झाली. वरवर पहाता सारे पक्ष (समाजवाद्यांखेरीज एकजीव नि एकजिव्हा झाल्याचे दिसले तरी प्रत्येकाने आपापले अंतरंग बेमालूम मुखवट्याखाली झाकलेले होते. समितीची कचेरी कुठे? तर गिरगावात भाई जीवनजी लेनमधल्या प्रजासमाजवादी पक्षाच्या कचेरीत! त्या पक्षाचे म्होरक्ये समितीचे कारभारी. फंडाचा सारा पैसा तिकडेच जमा व्हायचा. समितीचे जनरल सेक्रेटरी एसेम जोशी, एखादा पेच निर्माण झाला की समितीच्या सर्वपक्षीय सभा त्या कचेरीत व्हायच्या. एकेक वक्ता उभा राहिला का तासन्तास बोलतच रहायचा. मूळ मुद्दा राहिला बाजूला. सकाळी ८ ते १२ पर्यंत हाच प्रकार चालायचा. नंतर मंडळी जायची जेवायला. दुपारी २ ते ८ कधी ९ वाजेतोवर हाच क्रम. कॉ. डांगे सारा तमाशा पहात खुरमुंडी घालून कागदावर काहीतरी खरडीत बसायचे. सबंध दिवसभर लेक्चरबाजीच्या धिंगाण्याने जमलेले लोक मरगळलेले, हयास आले. का शेवटी कॉ. डांगे एक ठरावाचा मसुदा वाचून दाखवायचे नि तो लगेच एकमताने मान्य होऊन, सभा संपायची ज्यांना मुद्यावर काही बोलायचे असेल, त्याला कधी वावच मिळायचा नाही. पुढेपुढे तर वादविवादाच्या भरात सगळ्या पक्षाचे मुखवटे आरपार सरकायचे नि पक्षीय स्वार्थाचा तवंग स्पष्ट तरळू लागायचा. के बाबूराव अत्रे नि मी २-३ वेळा त्या सभांना गेलो नि तेथला फापटपसारा पाहून वैतागलो. समितीपाशी फंड किती नि खर्च कसकसा झाला नि होत आहे. याचा तक्ता सभेपुढे मांडावा, असे जनरल सेक्रेटरी श्री एसेम
यांना विचारताच, त्यांनी चक्क कानावर हात ठेवले. ते म्हणाले, "या बाबतीत मला काहीही माहिती नाही. प्रचाराच्या दौऱ्यांसाठी मला लागणारे पैसे मी माझ्या मित्रांकडून घेतो." म्हणजे, प्रसोपा कचेरीत स. म. समितीच्या पैश्याचा बोलो भाई राम येथेच उजेडात आला. असेंब्लीच्या निवडणुकांच्या वेळी सगळ्या संयुक्त पक्षांनी समितीचाच उमेदवार म्हणून प्रचार करावा, पक्षीय नावाने करू नये, असे ठरले होते. तरी प्रसोपाने आपल्या उमेदवारांच्या प्रचाराच्या पाट्या फलक पक्षाचे नाव घालूनच फैलावल्या. याबाबत ठिकठिकाणी समितीशी या स्वयंसेवकांचे नि प्रसोपाच्या लोकांचे झगडे रगड़ झाले.
समितीपूर्व काळात या प्रसोपाला गंडेरीवरही कुणी विकत घेत नव्हता, तो समितीच्या उबाऱ्याने लई मातला. समितीच्या हरएक हालचालीत यांचे बाकडे शेपूट आडवे यायचे शिवजयंती निमित्त आझाद मैदानावरून समितीची एक भव्य मिरवणूक काढायचे ठरले. त्यावेळी शिवाजीपार्कातल्या शिवाजीच्या पुतळ्यासाठी शेकडो स्वयंसेवकांनी मिरवणुकीच्या मार्गावर सीलबंद डबे फिरवून फंड गोळा करण्याचे काम प्रसोपाने खास आपल्या अंगावर घेतले. मिरवणूक गाजली गरजली. डबेही फिरले. पण महाराजा, डब्याचा हिशोब मी विचारला तर म्हणे डब्यात एक भोकाची दिडकी पडली नाही!" प्रसोपाच्या राजकारणी उलाढालीच्या नि लावालावीच्या अनेक गोष्टी लालजी पेंडसेच्या ग्रंथात पुराव्यासह नमूद केलेल्या आढळतील. अखेर अनेक धुसपुशी होऊन प्रसोपा पक्ष समितीला सोडून गेलेला. त्यावर मी ‘समितीचा कॅन्सर गेला` या मथळ्याचा लेख लिहिला. हा पिचक्या पाठकण्याचा पक्ष जेथे जेथे जाईल तेथे तेथे पक्षस्वार्थासाठी हवा तो विश्वासघात करायला चुकणार नाही. म्हणूनच समाजवादी पक्ष यांना वरचेवर ठोकरून दूर ठेवतो. शिवसेनेला हा अनुभव चांगलाच आलेला आहे.
बाकीचे कम्युनिस्टांसारखे पक्ष अगदी धुतल्या तांदळाचे अवतार होते अशातला प्रश्न नाही. खाली मुंडी मुलूख धुंडी हा त्यांचा खाक्या. समिती पूर्व काळी सगळ्या पक्षांचे पंख पिसकटलेले होते. समितीत घुसल्यामुळे त्यांना ते सावरता आले, हाच त्यांच्या पटाईत बुरखेबाजीचा मोक्ष त्यांना लाभला, सगळी वाताहत लागली तरी समितीचा कट्टर अभिमानी एकटा आचार्य अत्रे. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा महोत्सव साजरा करण्यासाठी, अत्रे आणि मी दोघांनी स्थापन केलेल्या जनता आघाडीने सगळा खर्च केला. इतर कोणीही दमडा दिला नाही. तरीही हा उत्सव समितीच्या नावानेच करण्याची होड अत्र्यांनी घेतली. मलाही माझा विरोध बाजूला ठेवून त्याला मान्यता द्यावी लागली. त्या उत्सवानंतर मी सगळ्याच चळवळीचा संन्यास घेतला.
जीवनगाथेचा शेवटला अध्याय
गेली ९-१० वर्षे टप्प्याटप्प्यांनी मी ‘जीवनगाथा` खरडीत आहे. खरे म्हटले तर माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या जीवनात वैयक्तिक असे लिहिण्यासारखे काय आहे? पण माझा जन्मच मुळी १९व्या शतकाच्या अखेरच्या दीड दशकातला. वयाच्या ७व्या वर्षापासून मी मराठी वर्तमानपत्रे वाचू लागलो. आजूबाजूच्या सामाजिक धार्मिक परिस्थितीत अगणित नि कल्पनातीत होत गेलेले सारे बदल मी अनुभवले. एकेक घटना अशा घडत गेल्या का त्या माझ्या आठवणी जाम चिकटून बसल्या. त्या आठवणींतही समाजाच्या स्थित्यंतराचा इतिहास असतो. तो कोणीतरी सांगितला नाही, लिहिला नाही, का सफाचाट पसरून जायचा. १८९६ सालचा दुर्गादेवी दुष्काळ, त्याच काळातली महाराष्ट्रवर आलेली टोळधाड या घटना आताच्या पिढीला कुणीतरी सांगितल्या पाहिजेत. माथेरान स्टीम ट्रामवे आदमजी पीरभाईनी स्थापन केली, हे कित्येकांना माहीत आहे? जीवनगाथेत माझ्या चरित्रातील महत्त्वाच्या घटना सांगत असतानाच, आजूबाजूच्या शेकडो घटनांचा मी सविस्तर विचार केलेला आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा जीवनगाथेचे लेखन माझ्या आजारपणामुळे बंद पडे. तेव्हा तेव्हा आग्रहाची अनेक पत्रे मला लोक पाठवायचे. आता मात्र वृद्धपणाच्या (८८) दडपणाखाली साऱ्या शक्ती मंदावल्या. अपंगावस्था आली. म्हणून वाचक भगिनी बांधवांनी माझा अखेरचा मुजरा घ्यावा.
।। जनता जनार्दनाच्या चरणी अर्पण असो ।।