महामायेचा थैमान
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
वज्रप्रहार ग्रंथ मालेतील पुष्प
महामायेचा थैमान
अर्थात
बावला – मुमताज प्रकरण
लेखक
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे
प्रबोधन मुद्रणालय,
पुणे शहर
पहिली आवृत्ती – जून १९२५
महामायेचे थैमान
स्त्रियश्चरित्रं... देवो न जानाति...
इमान ही एक मोठी अजब चीज आहे. इमानाचें वास्तविक स्वरूप काय आणि त्याची खरी किंमत किती, ह्याचा निश्चित निर्णय अजून कोणीच करू शकला नाहीं. पुष्कळ वेळां इमानाची किंमत कवडीमोल होते, तर कित्येक प्रसंगी जगातल्या सर्व संपत्तीलाहि त्याच्या मोलाचें माप मोजवत नाहीं. सुख पाहतां जवापाडें, दुःख पर्वताएवढें, हा तुकारामाचा सिद्धांत खरा मानला; तर एवढें कबूलच करावें लागेल कीं, जवापाडें का होईना, पण सुख म्हणून कांहीतरी अस्तित्वांत आहेच. जगाच्या व्यवहारांत दुष्टांची संख्या पुष्कळ असली तरी सुष्टांची संख्या थोडीतरी असतेच असते. तद्वतच बेईमान प्राण्यांच्या खटपटी व्यवहाराचा प्रवाह क्षणोक्षणी कितीहि विषारी बनवीत असल्या, तरी अल्पसंख्य इमानी प्राण्यांच्या उज्वल चारित्र्याचीं उदाहरणें खग्रास ग्रहणोत्तर चंद्रबिंबाप्रमाणें सर्व जगाचें लक्ष चटकन वेधण्याइतकी आकर्षक खास असतात.
नानाविध आधीव्याधींच्या रामरगाड्यांत हरघडी रगडून निघणाऱ्या मानवतेला बेईमानाच्या निखाऱ्यांवर पाय पोळून घेण्याचें प्रसंग वारंवार येत असले, तरी कधीं काळींच का होईना, इमानाचा स्वर्गसुखतुल्य स्पर्श उपभोगण्याचा आनंद तिला मिळतोच मिळतो. बाईल ना बांडा असा एखादा एकांतवासप्रिय सडेसोट मनुष्य व्यवहाराच्या काटेरी बाजारांत दिवसाची उदरनिर्वाहाची दलामल करून घरी परत येतांच, टाम्या कुत्र्याच्या त्या प्रेमदर्शक उड्या, त्याचें चाटणें, भुंकणें, अंगावर खेळणें, वगैरे इमानी प्रेमाचे प्रकार अनुभवून आपल्या सर्व व्यवहारक्लेषांना साफ विसरतो आणि कुत्र्यासारख्या पशूच्या सहवासांतहि वर्णनीय सुखाचा आनंद अनुभवतो. पशुपक्ष्यादिकांतहि इमान फार बलवत्तर आढळतें. कित्येकांत तर एकपतिव्रत व एक पत्निव्रत मनुष्यांपेक्षां अधिक निश्चयी व कमाल अव्यभिचारी असें दिसतें. कुत्र्यासारखा इमानी प्राणी दुसरा आढळत नाहीं. पण माणसांत पुष्कळवेळां कुत्र्याचें इमानसुद्धां मिळत नाही, म्हणून जगाचा व्यवहार दिवसेंदिवस कष्टप्रद होत आहे, असा कित्येकांचा विचाराचा सूर वहात असतो.
इमानाची देणगी देवानें कुत्र्यांनाच जास्त दिली आहे, आणि माणसांना कमी दिली आहे; किंवा ती पुरुषांत अधिक आहे आणि बायकांत मुळींच नाहीं, असा वास्तविक प्रकार नाही. गुणावगुणांचे प्रकटीकरण व्यक्तिमात्राच्या मनोवृत्तीवर होत असतें. मानवी मन हा एक गूढ विषय आहे. वेळीं इंद्रधनुष्याचे रंग मोजतां येतील आणि त्यांचे बिनचूक पृथ:करणहि करतां येईल; पण क्षणोक्षणीं आजूबाजूच्या परिस्थितीशीं आघात प्रत्याघाताचा अखंड व्यापार करणारें माणसाचे मन कोणत्या वेळीं कसल्या रंगाची रंगपंचमी खेळेल याचा नेम नाहीं. मनाचा हा तरळपणा स्त्रियांना मात्र लागू आणि पुरूष तेवढे पार्थिव मनाचे, हा भेद बेइमानी अर्थात् अन्यायाचा आहे.
स्त्रीजात तेवढी बेइमान
हा सिद्धांत ठोकणारा शेक्सपियर स्त्री नव्हता हे लक्षांत ठेवावें. हॅम्लेट नाटक जर एखाद्या शेक्सपियरणीनें लिहिलें असतें, तर ऑफिलियेच्या तोंडी `पुरुषजात तेवढी बेइमान` असें वाक्य कदाचित् घातलें नसतें कशावरून? मनुष्य सिंहाचें चित्र काढतो किंवा पुतळा बनवतो, तेव्हा एका माणसानें आपल्या हातानें सिंहाचा जबडा उचकून त्याला चीत केलें आहे, असा देखावा दाखवितो. उलटपक्षीं सिंहाच्या तडाक्यांत मनुष्य सांपडला तर तेथें काय देखावा दृष्टीस पडतो? हॅम्लेटच्या भूमिकेची पूर्णता करण्यासाठी शेक्सपियरनें `स्त्रीजात तेवढी बेइमान` हैं वाक्य त्याच्या तोंडी घातलें असलें तरी तें सिद्धांत होऊ शकत नाहीं. शेक्सपियरच्या सर्व नाटकांत हीरो (नायक) कोठेंच नाही म्हटलें तरी चालेल. त्यानें आपल्या बुद्धिवैभवाचें सर्व जरतारी लेणें वास्तवीक हिरॉइन्स (नायिकां) वर उधळून, त्यांचीच चित्रे उदात्त भडक रंगांत रंगविलीं आहेत, हें विसरतां कामां नये.
पुरुषांनी स्त्रियांवर बेइमानपणाचा आरोप लादणें; त्यांना `पायांतलीं खेटरें` मानणें, त्यांच्या नाकांत नथ, पायांत तोडे, हातांत कांकणे घालणें, तोंडावर काही ठिकाणी गोंदणें वगैरे गुलामी चिन्हांनी त्यांना `कःपदार्थ` ठरविणे, इत्यादि प्रकार पुरुषांच्या सत्तामदाचे व स्त्रियांच्या सहनशील मृदुल व अडाणी मनाचे द्योतक असले तरी ते अन्यायी घाशीरामीचे आहेत. एकजात स्त्रियांना बेइमान ठरविणारे पुरुष तरी एकजात इमानी असतात काय? व्यवहारांत जी मानकापी व दंडादंडी सदैव चालू आहे, त्यांत बेइमान पुरुषांचीच दंगल बेफाम भडकलेली आपण नित्य पहातो. इतकेंच नव्हे तर पुरुष बेइमान झाला तरीही आमरण इमानी राहण्यांत स्त्रियाच निश्चयी असलेल्या आढळतात. एखादी सटवी बाजारबसवी निघाली म्हणजे `स्त्रीजात तेवढी बेइमान` म्हणावी, तर दररोज एकमेकांविरुद्ध कारस्थानें लढविणारे पुरुष शेंकडा ७५ आढळल्यास सर्व पुरुषांची कत्तलच उडविणें रास्त होईल.
एवढी गोष्ट मात्र खरी कीं इहलोकीं स्त्रीजात आकर्षणाचें एक विलक्षण मानसचुंबकी केंद्र असल्यामुळे, स्त्रीचरित्राचा परिणाम जगाच्या इतिहासावर बऱ्याच दणक्यानें उमटलेला आहे. एवढे मोठे पराक्रमी रजपूत लोक, पण केवळ स्त्रियांच्या पायी नामोहरम झाले. त्यांचे ते जोहार, त्यांनी कसल्याहि उदात्त भावनेनें केलेलें असोत, तो त्यांच्या नामर्दाईचा किंवा रानटीपणाचा कळस म्हणा अगर दुसरें काय वाटेल तें नाव द्या, त्यांतहि स्त्रीचरित्रच प्रधान होतें. मानवी सृष्टींत स्त्रियांचे आकर्षण इतकें बलवत्तर आहे कीं केवळ त्यांच्यासाठी होत्याचें नव्हतें आणि नव्हत्याचें होतें होतें. स्त्रीजात तेवढी बेइमान म्हणणारे पुरुष एखाद्या इमानी मर्द पुरुषाच्या उदरांतून न जन्मतां, बेइमान स्त्रीचाच कुसवा धन्य करतात, हे एक नवलच म्हटलें पाहिजे. जेथें मानवांची उत्पत्ति स्त्रीच्या पोटीं, स्थितीसुद्धा स्त्रिसहवासावरच, तेथें त्यांचा लयही स्त्रीसाठींच झाला, तर स्त्रिया बेइमान कशा? पुरुष स्त्रियांना कितीही क्षुद्र लेखोत, स्त्रियांची निसर्गदत्त मोहिनीच अशी पराक्रमी आहे कीं स्त्रियांच्या सहवासाशिवाय पुरुषवर्ग तेव्हांच आत्महत्या करून मोकळा होईल. आईशिवाय मूल आणि बाईशिवाय बुवा, ही स्थिती आणि मसणवटी यांत काय भेद? मुलाची आई मेली तर दुसरी एखादी बाईच त्याला वाढविते, बुवांचा उपयोग काही नाहीं. नाटक कादंबरी सिनेमा काय वाटेल तें घ्या, त्यांत जर स्त्री नसेल तर त्याला कोणी ढुंकूनसुद्धा पहात नाहीं. स्त्रियांची हीं विश्वव्यापी मोहिनी काय करणार नाहीं?
तोंडातून ब्रही न काढतां ती वाटेल त्या रंकाचा राव करील व रावाला धुळीला मिळवील. या मोहिनीनें नसेल त्याला अब्रू दिली, व असेल त्याची चव्हाट्यावर फुंकली. या मोहिनीनें आजपर्यंत शेकडों धनुर्धरांना नुसत्या नेत्रकटाक्षानें पढ केलें आणि शेंकडों षंढांच्या हातून राज्यकारभार चालविले. ही मोहिनी फाटलेली अंतःकरणें जशी बेमालूम जुळविते, तशी बेमालूम जुळलेली हृदयें केवळ एका फणकाऱ्यांत टरटरा फाडते. दारिद्याच्या क्लेशांना सुखकर करणारीं शशिज्योत्स्ना हीच आणि अलोट संपत्तीच्या वैभवाला रखरखीत निखारे बनविणारी विद्युल्लताही हीच.
वैधव्याची कुन्हाड कोसळली असतां अन्नान्न अनाथ दशेंत स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन एकुलत्या तान्ह्याला जगविणारी हीच आणि राणीपदावर असूनही राजकारणी डावपेंचांसाठीं पोटच्या पोराचा खून करणारीहि हीच. असे कोणतें महाकाव्य आहे कीं ज्याची स्फूर्ती ह्या मोहिनीनें दिलेली नाहीं? सीतेसाठी रामायण झालें, दौपदीसाठी महाभारत जन्माला आलें आणि हेलनसाठी होमरचे इलियड सप्तस्वरांची ललकारी फोडूं लागलें. सारांश, स्त्रीचरित्र असें सर्वांग-पराक्रमी आहे. त्या पराक्रमाचें मूळ त्यांच्या ईश्वरदत्त मोहनींत आहे. त्या मोहिनींत कोणकोण शहाणे गद्धे बनतात आणि कोण कोण गद्धे शहाणे ठरतात, हें सांगणे कठीण आहे.
एका संस्कृत कवीनें म्हटलें आहे कीं,
स्त्रियश्चरित्रं पुरुषस्य भाग्यं ।
देवो न जानाति कुतो मनुष्यः ।।
ता. १२-१-२५ ला मुंबईस मलबार हिलवर बावला नांवाच्या एका धनाढ्य मुसलमानाचा खून झाल्याचें वृत्त आता सर्वांना माहीतच आहे. हा खून मुमताज बेगम उर्फ कमलादेवी नामक एका चटोर पोरीमुळे झाला आणि ही चटोर नार पूर्वी होळकर सरकारजवळ होती. प्रस्तुत खुनामुळे मोठमोठ्या लोकांच्या धरपकडी वगैरे धामधूम व खटल्यांच्या सुनावण्या होऊन तिघे फासावर व चार हद्दपारीवर चढले. या सर्व धामधूमीचा शांतपणे विचार करीत असतां स्त्रियश्चरित्रं पुरुषस्य भाग्यं की मरणं ? हा प्रश्न विचारार्थ पुढे आला आणि,
स्त्रियश्चरित्रं बावलस्य मरणं ।
होळकर न जानाति कुतो मनुष्यः ।।
असें वाटू लागलें. या प्रकरणाला जो इतका भडक रंग चढून त्याचा एवढा भडका उडाला त्याचें कारण इतकेंच कीं या लब्दाळ्याच्या बांगड्यांत एक खून पडला. नुसती बाचाबाची किंवा मारामारी होती तर मुंबईच्या पोटभरू व भांडकुदळ इंग्रजी मराठी दैनिकांची दोन चार दिवस चंगळ उडाली असती; यापलिकडे काहीं नाहीं. पण येथें तर खून पडला! छिनाल तरुणींच्या पायी मुंबईत व इतरत्र काय कधी खून पडलेच नाहींत? का आज पडत नाहींत? का पुढें कधीं पडणार नाहींत? मुंबईसारख्या गोचिड वस्तीच्या बकाली शहरांत लव्हाळ्याच्या त्रांगड्याचे खून नेहमींच पडत असतात. त्यांची योग्य ती व्यवस्था लावण्यास पोलिस खाते आहेच. मग ह्या मुमताज प्रकरणाचाच एवढा गवगवा कां?
खून होतांच टाईम्स वगैरेसारख्या आंग्लपत्रकारांनी जो एकदम मोठ्या तारस्वरांत गिल्ला केला, त्यांत त्यांची एवढीच चिंता स्पष्ट दिसत होती की मलबार हिलवर ज्या ठिकाणी हा खून झाला ती जागा म्हणजे युरपियन क्लबाच्या अगदी शेजारी, सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत हवाखाऊ गुलहौशी लोक, आषिकमाषुर्के आणि लव्हाळी पात्रे ह्या ठिकाणावरून हँगिंग गार्डनकडे नेहमीं जात येत असतात, मलबार हिलवर रहाणाऱ्या युरपियन लोकांच्या मोटारी जाण्याचा हमरस्ता, तेव्हां खुनासारखे प्रकार जर तेथें होऊ लागले, तर या सर्वांवर मोठाच अनवस्था प्रसंग!
एरवीं साऱ्या मुंबईच्या नाक्या नाक्यावर पठाणांची सोटेबाजी भरदिवसा चालली तरी लोकांच्या चिंतेचा घामसुद्धा ज्या आंग्लपत्रकारांना कधी फुटायचा नाही, त्यांना या अनवस्था प्रसंगाची एवढी दहशत का? तर तो रस्ता म्हणजे युरोपीय लोकांच्या जाण्यायेण्याचा हमरस्ता म्हणून! खुनाबद्दल कोणी झाला तरी तीव्र संतापच व्यक्त करील आणि इतर देशी पत्रांप्रमाणे या पत्रांनीहि केला यांत नवल नाही. पण सुरुवातीलाच चवथ्या सप्तकांत चढविलेला यांचा सूर एकदम मध्येंच खर्जांत कां घसरला देव जाणें! बरे, ज्याचा खून झाला तो तरी असा कोण मोठा गृहस्थ होता कीं, त्याच्या मृत्यूमुळें सारें हिंदुस्थान एकदम हादरून जावें? बावला म्हणजे कांही इजिप्तचा सरदार सर लीस्टॅक नव्हे कीं नाशिकचा कलेक्टर जॅक्सन नव्हे. बावला मोठा धनाढ्य असेल. मुंबईचा शेरीफ व नगरशेट द्वारकादास धरमसी काय कमी श्रीमान होता? पण त्याचा खून झाला त्यावेळी असा दणदणाट कांही उडाला नाहीं. मग ह्या प्रकारांतच एवढा भयंकर गाजावाजा कां? तर या खुनाला कारण झालेली चटोर चिमणी मुमताझ ही पूर्वी इंदोरचे तुकोजीराव होळकर यांच्याजळ होती, हा संबंध त्यांत प्रामुख्याने पुढे आला म्हणून विलायतेस चाललेल्या रॉबिनसन केसमध्ये काश्मिरचे युवराज हरिसिंग ह्यांना लव्हाळ्याच्या लफड्यांत पिळून काढणाऱ्या इंग्रजी हरामखोरांचा कट नुकतांच जनजाहीर झालेला होता. त्यांत होळकर सरकारच्या या खऱ्याखोट्या लफड्याची भर पडली. मग काय विचारतां?
आधींच मर्कट असलेल्या काही पत्रांना ही लफड्याची दारू पथ्यावरच पडली. त्यांनी या बावला-मुमताझ-होळकर प्रकरणावर वाटेल तें खरडून आपली मनिषा तृप्त करून घेतली. अझूनही हा शिमगा चालूच आहे. कै. शिवाजीराव होळकरावा `न्हाणवली भादरल्याच्या` आरोपाचा बेशक मारा करणाऱ्या `भूत` `गुराखी` `विक्षिप्त` प्रभृति माजी पत्रांची संतति आज उमाप पिकलेली असल्यामुळे आज २५-३० वर्षांनी होळकरांची होळी करण्याचा आलेला सिंहस्थ योग कोण धूर्त पत्रकार गमाऊन बसेल? ज्यांचे जीवनच कुचाळक्यांवर चाललेलें, त्यांना ही संधी म्हणजे अमूल्य पर्वणीच नव्हे तर काय? पण आपला हा मुख्य मुद्दा नव्हे. खून झाला आहे.
त्याचा योग्य तो तपास लावून मुद्यापुराव्यानिशीं गुन्हेगार ठरतील त्यांला शासन होणें आवश्यक आहे आणि ते काम सरकारच्या न्यायंदिरांनी योग्य रीतीनें केलेच आहे. त्रयस्थ दृष्टीनें या भयंकर प्रकरणांतून आपल्याला काय बोध घेता येईल तो पहावा, एवढाच या लेखाचा उद्देश आहे. यासाठी या नाटकांतील प्रत्येक मुख्य पात्राचें स्वभावपरीक्षण व त्यांची परस्पर नात यांचा प्रथम विचार केला पाहिजे. या कामी लागणारा तपशील अनेक वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या माहितीवरूनच घेतला आहे. बाजारगप्पांवर विश्वास ठेवणें योग्य होणार नाही. जिच्यामुळे हे लव्हाळे नाटक रक्तलांछित झाले ती नायिका
मुमताझ बेगम उर्फ कमला देवी
नांव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा असे या नायिकेचें नव्हे, नायकिणीचें चारित्र्य आहे. जिच्या उज्चल चारित्र्याची कीर्ति अजरामर करण्यासाठी जगविख्यात ताजमहाल आजहि यमुनेच्या तीरावर उभा आहे ती शहाजहान बादशहाची मुमताझ कोणीकडे आणि ही चटोर गांवभवानी कोणीकडे! नखरेलपणाच्या जादूने श्रीमान तरुणांना भुरळ घालून आपली पोतडी भरणाच्या ज्या उलट्या काळजाच्या धाडसी स्त्रिया असतात, त्यांतलीच ही एक छिनाल तरुणी आहे. हिच्या आईप्रमाणे हिला गातां नाचता येते की नाहीं, हे आम्हाला माहीत नाहीं; पण आज तरी या महामायेने तिघांना फासांवर, चौघांना हद्दपार करून अनेक मोठमोठ्या लोकांना रडत नाचावयास लाविलें आहे खास. जात्याच वेश्या खाणीतली हिरकणी असल्यामुळें `ही कामाची तलवार, करिल ज्या बार, ठार तो समजा` हें प्रत्यंतर कधी काळी येणारच येणार, हे होळकर महाराजांना व बावलाला कळू नये, या धुंदीलाच प्रेमाची आंधळी कोशिंबीर म्हणतात.
जिच्या प्रेमाची सरकगांठ फक्त लाखों रुपयांच्या जडजवाहिराच्या डबोल्याला चिकटलेली, तिला इमानाची पर्वा काय? `एकावरि मन ठेउनि नेत्रें खूण करिती दुसऱ्याला` असल्या वृत्तीच्या साहसी स्त्रियांच्या प्रेमपाशाचे फास धनकनकसंपन्न तरुणांच्याच गळ्यांत अचूक पडत असतात. असल्या फासांत काश्मिरचे हरिसिंग, इंदोरचे तुकोजीराव किंवा इतर धनाढ्यांनी न अडकावें तर कोणी? मुमताझच्या तारुण्याची कळी होळकरांच्या राजवाड्यांतच प्रथम उमलली, आणि तिथेच ही बेगम कमलादेवी बनून महाराजांच्या प्रेमालिंगनास पात्र झाली. सर्वसामान्य नर्तकी नायकिणीच्या अपेक्षेपेक्षांहि हा राजाश्रय मुमताझला पुष्कळच किफायतशीर झाला असावा असे मानण्यास चिंता नाही. पण बोलून चालून वेश्येची अवलाद! तिचा पाय एक ठिकाणी कसा ठरणार?
वेश्येच्या बाबतीत निशेचा किंवा इमानाचा प्रश्नच येत नाही. होळकरांची स्वारी दौऱ्यावर असतांना काही गुप्त बातबेत ठरवून ही कमलादेवी डबोल्यासह दिल्लीच्या स्टेशनांत महाराजांच्या क्षीरसागरी आश्रयाचा त्याग करून पळाली आणि अखेर मुंबईस येऊन बावला नामक एका धनाढ्य खोजा तरुणाच्या गळ्यांत पडली. ती आपले पूर्वचरित्र विसरली आणि आतां उघड माध्याची गांवभवानी बनली. मुमताज बेगमच्या प्रसिद्ध झालेल्या हिंदु पेहरावांतील पोषाखावरून ती कोणी मोठी उर्वशी का रंभा असावी असे मुळीच वाटत नाही. तारुण्याच्या सहजरि `एकनूर औरत तो दस नूर कपडा` यापेक्षा विशेष आकर्षक काही दि नाही. तरी पण तिने आज आपल्या चवचाल प्रवृत्तीला बळी दिलेल्या व देऊ घातलेल्या नरमेधाची कल्पना डोळ्यापुढे उभी राहिली की तिच्या राक्षसी आकर्षणाकडे सान्या जगाचे डोळे का वेधू नयेत? तिचा `दिल्दार यार` बावला `असता औक्ष` ठार व्हावा अशी तिची इच्छा असणे केव्हांही शक्य नसले, तरी तिच्या कृतकर्माचा विपाक केव्हां ना केव्हा असाच व्हावा, एवढी तरी तिची व खुद्द बावलाची कल्पना नव्हतीच असे मात्र नव्हे. सारांश-
मुम्ताज बेगम चरित्र अपूर्व साचें ।
तें भाग्यखेलन विचित्रचि बावलाचें ।।
त्या चारचक्षु नृपराज नरोत्तमातें ।
जेंना कळें, कुठुनी ते जड पोलिसातें! ।।
पोलिस घेऊन जाऊन खुनी इसमांचा शोध लाऊन त्यांना न्यायाधीशाकडून शासन करवतील, पण मुम्ताजच्या चवचाल प्रेमाच्या आडाख्याचं रहस्य शोधन करणार नाहींत. तें त्यांचे क्षेत्र नव्हे. तें त्यांचे कर्तव्य नव्हे.
हतभागी बावला
एखाद्या अपघातामुळे किंवा हृदयद्रावक मृत्यूमुळेंच प्रसिद्धीस येण्याचे ज्या व्यक्तीचे नशीब असतें, त्यांपैकी बावला ही एक तरुण व्यक्ती होय. बावलाचा खून झाला नसता तर या क्षुद्र व्यक्तीला कधीच काहीं महत्व आलें नसतें. बावला मुंबई म्युनिसिपल कारपोरेशनचा सभासद होता. म्हणजे एवढ्यावरून तो मोठा विद्वान, जनहितकर्ता आणि लोकप्रिय फिरोजशा मेहता होता असे नव्हे. संपत्तीच्या जोरावर वाटेल तो ऐदी रेम्याडोक्या कारपोरेटर किंवा कौंसिलर होऊ शकतो. म्युन्सिपाल्ट्या, लोकल बोर्डे किंवा कौन्सिलें यांत केवळ पैशाच्या जोरावर व्हट्ट मिळवून घट्ट बसलेले शेणाचे मठ्ठ गोळे काय कोणाला दिसत नाहीत? असलाच हा एक मठ्ठ गोळा होता. मुंबईत तर याचें नांव बहुजन समाजाला खून झाल्यावर कळले.
केवळ नुसती श्रीमंती ही कांही बावलाच्या थोरवीची विमापॉलिसी नव्हे. कदाचित तो मोठा व्यापारी असेल, त्याच्या जातीत मोठा वजनदार असेल अथवा कारपोरेशनच्या क्लबांत तो मोठा जॉली फ्रेंडहि असेल. पण एवढ्यानेंहि त्याच्या थोरवीचें मंडण होणें नाहीं. तो एक श्रीमंत तरूण होता. बराच रंगेल होता. कोणाच्या आगीदुर्गात फारसा पडणारा नव्हता. आपलें काम, आपला दाम, आपलीं व्यसनें आबांत सांभाळून मोटारी उडविणारा एक जवान होता. इतकेंच. इंदोर सरकारला बगल मारून बावलाच्या बगलेत मुमताझ घुसण्यापूर्वी त्यानें तिचा कोणत्या मुद्यावर स्वीकार केला असावा? ती काय अशी मोठी अस्मानची परी होती, कीं शुद्ध प्रेमाची गंगाभागीरथी होती, की कोणी अनाथ अपंग होती म्हणून ह्या धनाढ्यानें तिला आश्रय दिला? मुमताजच्या पूर्वाश्रमाचा सर्व इतिहास कळल्याशिवायच त्यानें तिला आपल्या उंबरठ्यावर घेतलें, या म्हणण्यांत काही अर्थ नाहीं. असें होर्णेच शक्य नाही. सद्गुणांप्रमाणेंच दुर्गुणांतहि एक प्रकारची चुरशीची अहमहमिका असते. राज्यक्रांती घडविणाऱ्या बीराला जसें वाटतें कीं मी अमक्या तमक्या राजाची राजधानी हस्तगत केली, त्याची गादी मी पटकावली, त्याचप्रमाणे वेश्यागमनी लोकांतही अमक्या तमक्याची रखेली मी पटकावली म्हणून गर्व वहाण्याची एक आसुरी अहमहमिका असते. ही बहुधा बिनधोक पचली जात नाही. हिच्यापायी खुनासारखे प्राणांतिक प्रकार अनिवार्यच असतात, हें न समजण्याइतका बावला खरोखरच बावळा असावा काय?
होळकर सरकारला फसवून पळून आलेली मुमताज आपल्या घरांत घेतांना, वरील आसुरी अहमहमिकेनें बावला जरी क्षणभर फुरफुरला असला, किंवा तिच्या बरोबर असलेल्या लाखी डबोल्याच्या वासाला भुरळला असला, तरी या महामायेच्या मुळे पुढे मार्गे आपणांवर कांही संकट येणें शक्य आहे कीं काय, याचाहि ज्याला कांहीं विचार सुचला नाहीं, किंवा सुचला असल्यास जुमानला नाहीं, तो बावला एक तर मुमताजप्रमाणे धाडसी धूर्त असावा, नाहींतर मूर्ख असावा, यापेक्षां तिसऱ्या कोणत्या संज्ञेत त्याला बसवितां येईल? असेहि म्हणतात की मुमताजला बावलानें आश्रय दिल्यापासून त्याला धमक्यांची अनेक पत्रे येत होती; पण तीहि त्यानें विचारांत घेण्याचे टाळले. यावरून मुमताजच्या जीवाला जीव देण्याचा त्याचा आसुरी अहमहमिकेचा निश्चय वज्रप्राय दिसतो. अर्थात् असल्या व्यभिचारी लफड्याचा होणारा तोच अनिवार्य परिणाम झाला आणि मुमताजच्या जीवासाठीं बावला आपल्या जिवाला मुकला!
विषाची परीक्षा पहाणाराला मृत्यूशिवाय सुटका कोठली? सामान्य विचार करणारांना `हें असें होऊं नये` असें वाटतें खरें आणि बावलाच्या दुर्दैवी प्राणान्ताबद्दल वाईटहि वाटतें. पण खुद्द बावलाच जेथें काट्यावर धड टाकतो, तेथें तुम्हा आम्हा त्रयस्थांचा ऐदी विचार काय कामाचा? सारांश, ज्याला आपण `कल्चर्ड सोसायटी` (सुसंस्कृत समाज) म्हणतो, त्याला न शोभेसें बावलाचें वर्तन होतें. बाह्यात्कारी जरी जो मुंबई म्युनिसिपालटी कारपोरेशनचा सभासद होता, तरी त्याचें खासगी वर्तन निंद्य होतें, असें म्हणण्यास मुळींच प्रत्यवाय नाहीं. मुमताज त्याला पचली असती, तर आतां उघडकीस आलेलीं त्याची सर्व व्यसनें व व्यभिचारी कृत्यें पैशाच्या दमावर सफाईत झांकली गेली असती.
मेल्या म्हशीला दूध फार या न्यायाने कोरून उकरून काढलेल्या त्याच्या कांही गुणांचे पोवाडे गाणें स्तुतिपाठकांना भागच आहे. पण सामान्यतः इतर रंडीबाज माणसांपेक्षां बावलाला संस्कृतीच्या बाबतींत फारसें अधिक मार्क मिळणें शक्य नाहीं. या नाटकांतलें तिसरें आणि विशेष निंदेला पात्र झालेलें, किंबहुना कांही हुल्लडखोर पोटभरू पत्रांना किफायतशीर झालेले पात्र म्हणजे श्रीमन्महाराज तुकोजीराव होळकर हें होय. सेशन कोर्टात आतांपर्यंत झालेल्या उलट सुलट छाननींत, श्रीमंतांनी मुमताजला दिलेल्या राजवैभवी आश्रयापेक्षां त्यांचा अधिक कसलाही दोष सिद्ध झालेला नाही. ज्यांना राजवैभवाची कल्पनाच नाहीं, राजेलोकांच्या राहणीची माहितीच नाहीं, ज्यांचा सारा जन्म `ये रे दिवसा भर रे पोटा` अशा दलमलींतच जाणारा त्या लोकांना होळकरांनी मुमताजला दिलेला आश्रय `दोष` वाटणें सहाजिक आहे. होळकरांनी मुमताजला कांही पट्टराणी बनविली नव्हती!
राजे लोकांच्या दिमतींत कितीक तरी अशा मुमताज पडलेल्या असतात, ज्यांचे जोडे पुसणाऱ्या हुजऱ्यांच्या हातांत सोन्याचे तोडे झळकतात, ज्यांच्या शौचकुपाच्या झाडूला विशेष आनंदप्रसंगी हजार हजार पांच पांच हजार रुपये केवळ बक्षिसादाखल मिळतात, त्यांनीं मुमताजसारखीला लाखों रुपयांच्या जवाहिरांत गर्द गाडली तर त्यांत विशेष तें काय? मात्र, जिचा जन्मच नुसता सैंय्यामैंय्यावर जायचा, तिला दैवयोगानें होळकरांचा आश्रय `विशेष` वाटणें सहाजिक आहे. परंतु राजवैभवी क्षेत्रांत ह्या गोष्टीला कसलेंहि महत्व नाहीं. खालसांतल्या लोकांना आज राजवैभवाची कसलीच कल्पना नसल्यामुळे, एखाद्या महाराजाच्या पायांत रत्नजडित चढाव पाहतांच `संपत्तीचा हा शुद्ध सत्यानास वाटून संतापानें घेरीहि येईल.
राजेलोक जेवायला बसले की ताटांत वाढलेल्या अनेक उंची पक्वात्रांना नुसता स्पर्श करून उठतात, तर दररोज सांजसकाळ मुदपाकखान्याचा शेंकडों रुपयांचा खर्ज त्यांना `फाजील उधळपट्टी` हि वाटणें अगदी साहजिक आहे. गव्हर्नर व्हाइसरायादि आंग्रेजी देवांचा थाट तर याहिपेक्षां शतपट लाखीं लखाखीचा असतो. राजे गव्हर्नर व्हाइसरायच आंबटवरण भात खाऊन खादी पांघरू लागले तर सामान्य प्रजा आणि राज्यकर्त्यांत भेद तो काय राहिला? सारांश, लाखी जवाहिराच्या दिगांत चमकणारी मुमताज सर्व सामान्य माणसांना मोठी चटकचांदणी दिसली, तरी होळकरांच्या राजवैभवी क्षेत्रांत त्यांच्या दिमतीला असलेल्या शेकडों परिजनांच्या मानानें `दर्यामें खसखस` इतकेंच महत्व फार झाले तर तिला मिळेल.
मुमताज जात्या स्त्री असल्यामुळे स्त्रीदाक्षिण्याची खरी खोटी घमेंड मारणाऱ्या पुरुषांना तिथी बाजू घेऊन होळकर सरकारची यथास्थित नालस्ती करतांना, या महामायेच्या उलट्या काळजाचे विस्मरण झालें नसतें तरच मोठे आर्शय, पत्नी असो वा रखेली असो, तिच्याविषयी एक प्रकारचा आपलेपणाचा विश्वास परिचयानें परिणत होत असतो, हा विश्वास पति किंवा पत्नि अथवा यजमान आणि रखेली यांपैकी कोणीही एकानें दुखावला तर त्याचें पर्यवसान पुष्कळ वेळां सुडांत होतें. कोणत्याहि सेव्यसेवक भावनेत हाच प्रकार असतो. शिवाजीच्या आमदानीत प्याद्याचा फर्जी झालेला हिरोजी फर्जद संभाजीशी लवमात्र बेइमान होतांच त्याला संभाजीनें चिपळूणाहून पकडून आणून ताडकन् हत्तीच्या पायाखाली चिरडून ठार केला. मुमताज ही एक क्षुद्र कलावंतिणीची पोर. कलावंतिणी राजदरबारांत ठेवण्याचा प्रघात होळकरांनीच नवीन पाडला असे नाही. दरबारांतल्या निवडक कलावंतिणींनी आज पर्यंत शेंकडों राजांचा रखेलीपणाहि पटकविल्याची उदाहरणें आहेत. होळकरांचा आश्रय न मिळता तर ही चटकचांदणी मुमताज देवाची परीसीमा गांठली तरी गांवभवानीपेक्षां अधिक महत्त्वास चढली नसती. होळकरांचा आश्रय मुमताजला इतका अपूर्व वाटला की हा कायमचा टिकतो कसा याची तिला चिंता उत्पन्न झाली व मिळालें आहे तेवढे घबाड घेऊन पसार व्हावें, इकडे तिचें लक्ष लागले. या निमित्ताने ह्या उलट्या काळजाच्या महामायेनें केलेले उपद्व्याप व गुप्त कट कधी तरी मुद्यापुराव्यानिशीं जगापुढे येतीलच येतील, अशी आम्हांला खात्री आहे. स्वदेशी राज्यांत अझूनहि अनेक कच्च्या पक्क्या गुणांची बूज राखली जाते. त्याप्रमाणे मुमताज होळकरी आश्रयांत `कमलाबाईसाहेब` बनली. परंतु दैववशात् हाती लागलेलें लाखों रुपयांच्या जवाहिराचें घबाड पचविण्यासाठी तिनें अनेक युक्त्या प्रयुक्त्या लढवून, अखेर ती होळकरांच्या अन्नाशीं बेइमान झाली व त्यांना दगा देऊन पळाली.
विश्वासाचा घात केला, दिलेल्या मानाची मान कापली आणि आपला निसर्गसिद्ध बाजारबसवेपणा सिद्ध केला. इंग्लंडात सर हरिसिंग यांना कारस्थानी लोकांच्या जाळ्यांत पकडूंत लाखों रुपये उपटण्याचा कट रचणारी हलकट रंडी रॉबिनसन आणि ही पाताळयंत्री मुमताज या दोघी एकाच सूत्रगोत्राच्या अवलादी आहेत. रॉबिनसन केसमध्ये सर हरिसिंग यांचा कांही दोष कोरून उकरून काढलाच तर हाच म्हणतां येईल की त्यांनी मिसेस रॉबिनसनला रखेली ठेवली. होळकरांचीहि एवढीच चूक की चेहऱ्यामोहऱ्यानें मोहक दिसणारी ही छटेल मुमताज रखेली ठेवून दिली. यापेक्षां अधिक काय आहे? रखेल्या ठेवू नयेत, हें तत्त्व चांगलें खरें पण कोणी ठेवल्याच तर त्या रखेलीनें विश्वासघात करावा हें तरी माणुसकीला किती शोभतें?
रखेल्या ठेवण्याची पद्धत अझूनहि पुष्कळ रूढ आहे. बेळगांव धारवाड कर्नाटक गोमांतक इकडे तर `रांड ठेवणें` हे सभ्यपणांत मोडतें. नवीन विचारांच्या प्रगतीमुळे हा सभ्यपणा कोणी पूर्वीप्रमाणे फारसा बोलून दाखवत नसलें तरी ही रूढ़ी आहे तशीच बनअटकाव चालू आहे. इकडे मुंबई पुणे प्रांतात हा व्यवहार नाना प्रकारच्या सोंगाढोंगाखाली चालू आहेच.. रंडीबाज लोक बऱ्याच लघळ लांब जिभांचे असल्यामुळे कोणी आक्षेप घेतांच ते नाकाला जीभ लाऊन चटकन मोकळे होतात, एवढेच. सारांश, रखेल-बाजी ही कोणत्या ना कोणत्या रूपांत सर्व काळीं सर्व ठिकाणी रूढ होती.
आज आहे आणि जोपर्यंत मानवांच्या भावनांत आमूलाग्र विलक्षण क्रांति होणार नाहीं तोंपर्यंत पुढेंहि ती तशीच चालू राहणार. मग संपत्तिमान लोकांना व स्वयंनिर्णयी राजांनाच तिचें वावडे कां म्हणून असावें? श्रीमंतच वास्तविक रखेल्या ठेवूं शकतात व पोसूं शकतात. हातावर मिळवून तळहातावर खाणाऱ्या पोटार्थ्यांचा तो प्रश्नच नव्हे. नीतीची तत्वे कांहीहि असली तरी लव्हाळ्याचे त्रांगडेच मोठे जबरदस्त आहे की त्यापुढे ब्रह्मदेवाच्या अकलेची सुद्धा टाप चालत नाहीं, मग मनुस्मृतीला कोण भीक घालतो? आणि पोटार्थी पुराणिकांच्या पापपुण्याच्या पुराणांना पुसतो कोण? `अव्यवस्थित व्यवहारापेक्षा विवाह बरा` हें सूत्र मान्य झालें कीं `गुप्त व्यभिचारापेक्षा उघड रखेली बरी` हे सूत्र व्यवहारांत तरी निदान फारसे निंद्य ठरणार नाही. शेंकडों विधवांना व कुमारिकांनाहि पंढरपूरच्या वारकरणी बनविणारे हजारों नराधम आज हिंदुसमाजांत प्रतिष्ठितपणे वावरतांना काय कोणाला माहीतच नाहीत? होळकर किंवा हरिसिंग यांच्यावर टीकेचा भडीमार करणारे शहाणे स्वतः तरी नीतीमत्तेचे निष्कलंक पुतळे आहेत काय? वर्तमानपत्राचा संपादक वनतांच त्याच्या शेंकडों निंद्य कृष्णकृत्यांवर छापखान्यातल्या शाईचा काळा पडदा पडतो आणि `सारे खून माफ` झालेला हा प्राणी `केवळ पोटासाठी` नीतिमत्तेच्या ढोंगानें बाटेल त्यावर लूत लागलेल्या कुत्र्याप्रमाणे भुंकण्यास समर्थ ठरतो, असे समजण्याचा काळ असून आलेला नाहीं. पुढें कदाचित् आलाच तर ह्या ढोंगी तत्ववेत्त्यांना भर तिव्हाट्यावर जोडे पैजार करायला विवेकी जनतेला फाटक्या पायतणांचा तुटवडा खास पडणार नाही.
तात्पर्य, मुमताजला होळकर सरकारने आश्रय देण्यांत पोटभरू पत्रकर्त्यांकडून आपल्या बेचाळीस पितरांचा उद्धार करून घेण्याइतका मोठा भयंकर अपराध केला आहे, असे मुळींच नाहीं. श्रीमन्महाराज तुकाजीराव होळकर हे आपल्या अफाट इंदोर संस्थानांत अत्यंत लोकप्रिय असे नृपति आहेत. लोकांची त्यांच्यावरील श्रद्धा व प्रेम वर्णनीय आहे. गांव तेथें महारवाडा आणि घर तेथे शेतखाना या नियमानुसार महाराजांचेंच अन्न खाऊन त्यांच्या तळपटाचे चिंतन करणारे कांही भिक्षुकी अड्डे खुद्द इंदोरांत आहेत, नाहीं असें नाही. पण एकंदर लोकसंख्येच्या मानानें या कृतघ्न कारस्थान्यांची संख्या मूठभर म्हटली तरी चालेल. मागें चार पाच वर्षांपूर्वी एका इरसाल भटानें असेंच एक `बलात्कारें ब्राह्मणी भोगिली`चें काहूर महाराजांविरुद्ध बाँबे क्रॉनिकल पत्रांत उठविलें होतें.
त्या वेळचे संपादक आग्यावेताळ हॉर्निमन यानी तर त्या पराचा भयंकर कावळा केला. भिक्षुकशाही छावण्यांत तर एकच सूर वाहू लागला की हॉर्निमनची चार पांच सणसणीत आर्टिकलें फडकली कीं
इंदोर संस्थान खालसा झालेंच!
स्वर्ग अगदी दोन बोटें उरला, पण इतक्यांत इंदोरच्याच प्रजाजनांनी अक्राळविक्राळ विराटरूप धारण करून सर हुकूमचंद शेटजींच्या मुखानें `मुद्यापुराव्यानिशी कोण मायेचा पूत पुढें येत असेल त्यानें यावें` असें दणदणीत आव्हान देतांच सर्व भिक्षुकी कारस्थान ठिकच्या ठिकाणी थंडगार! असें कोणतें ब्राह्मणेतर संस्थान आहे कीं ज्याचें तळपट उडविण्याच्या कामी भिक्षुकांनी व भिक्षुकी पत्रकारांनी आपल्या कारस्थानी अकलेला ताणावे दिले नाहींत? सातारच्या प्रतापसिंह छत्रपतीला यांनींच नाना प्रकारची कुलंगडीं उपस्थित करून कायमचा उखडला. कोल्हापुरच्या राजावर या राजापुरच्या कोल्ह्यांची तर केवढी वक्रदृष्टी! बेळगांवच्या नामदार बेळवींनी एका कुळकर्णी परिषदेत सांगितलें कीं "In Kolhapur no man`s life or wife is safe" (कोल्हापुरात कोणाहि माणसाचा जमाना किंवा जनाना बिनधोक नाही.) तर आमच्या केसरी दादानीं पांचजन्य ठोकला की "पहा हो पहा, हा शाहूमहाराज स्वराज्यद्रोही छत्रपति आहे."
यापेक्षा निंदेचा व शिव्याश्रापाचा कडेलोट कडेलोट म्हणतात तो कोणता? बडोद्यास ऐतखाऊ भटांची खिडकी बंद केली तेव्हा सयाजीरावांवर केवढा गहजब! २५-३० वर्षांपूर्वी कै. शिवाजीराव होळकरावर उठलेले भिक्षुकी काहूर पुष्कळांच्या स्मरणांत असेलच. आज तुकोजीरावांची बेलगाम निर्भत्सना करणाऱ्या पोटभरू भिक्षुकी पत्रांतल्या हलकट चित्रांशी व पोरकट लेखांशी तें ताडून पाहिलें, तर स्वदेशी राजांची अवहेलना करून त्यांच्या निंदेवर आपली लोकमान्यता सांवरण्याची ही एक अखंड भिक्षुकी परंपराच आहे असें स्पष्ट दिसून येईल. शिवाजीराव होळकरांच्या वेळी मुंबईस आवसेपौर्णिमेला अवतरणारें फाटकांचे भूत, १८९२ ते १८९६ पर्यंत मुंबईला `सोनेरी टोळी` नावांखालीं धुडगूस घालणाऱ्या पटाईत लुटारू कंपूंतल्या भाट्यांचा गुराखी व विक्षिप्त, ही पत्रे म्हणजे आजच्या मौज चाबुक वगैरे पाचकळ ये पूज्य पितर होत. एका ब्राह्मण न्हाणवलीची मिरवणूक चालली आहे.
शिवाजीराव ती न्हाणवली पकडीत आहेत व न्हाव्याकडून तिचे प्रेम भादरीत आहेत, असली चित्रे `इंदोरांतील अत्याचार` मथळ्याखाली या पत्रांत दर आठवड्यास प्रसिद्ध होत. त्याचप्रमाणे इंदोरातील वकीलांकडून राजवाड्यासमोरची सडक उकरून, तीवर खडी दाबण्यासाठी वकीलांना टोणग्यांएवजी मुन्सिपालटीच्या रुळाला जुंपले आहेत, हळदकुंकवास जाणाऱ्या ब्राह्मण बायकांना शिवाजीराव भंग्यांकडून खराट्याचा मार देत आहेत, शेंकडों ब्राह्मण घरांवरून शिवाजीराव गाढवांचे नांगर फिरवीत आहेत; प्रजाजन जीव खाऊन स्टेशनवर भयभीत पळत आहेत; भर रस्त्यावर शिवाजीराव ब्राह्मणांच्या पगड्या भंग्यांच्या डोक्यावर व भंग्यांच्या टोपल्या ब्राह्मणांच्या डोक्यांवर चढवीत आहेत; इत्यादि हजारों अनन्वित काल्पनिक आरोपांची शिळा छापाची कार्टून चित्रे व तसल्याच धर्तीचे घाणेरडे लेख भूत गुराखी, विक्षिप्तादि पत्रांतून एकसारखे प्रसिद्ध होत असत.
शिवाजीराव होळकरांची ही भिक्षुकी निंदा अखेर त्यांच्या राज्यसंन्यासाला कारण झाली व कारस्थान्यांच्या नवसाला परशुराम फळला. ही एक चणचणित भवानी निंदक पत्रांच्या संप्रदायाला दोन अडीच तपांपूर्वी प्राप्त झालेली असल्यामुळे, महामाया मुमताजच्या पुण्याईने आज हाताशी आलेली होळकर-उच्चाटनाची पर्वणी कोणता भिक्षुक पत्रकार गमाऊन बसेल? स्वराज्याचा, स्वयंनिर्णयाचा, स्वातंत्र्याचा सध्या केवढाही हैदोस सुरू असला, तरी कोल्हापूर, ग्वाल्हेर, इंदोर, बडोद्यासारखी मोठमोठी ब्राह्मणेतर संस्थानें स्वराज्यवाद्यांच्या डोळ्यांत बाळूप्रमाणे सलत आहेत, ही गोष्ट बहुजनसमाजाला व खुद्द ब्रिटिश सरकारला आतां पूर्ण माहीत आहे.
त्याचप्रमाणे नीतिदाक्षिण्याचा मोठा आव आणून स्वदेशी राजांच्या अनीतीचे वाभाडे काढणारे पत्रकारहि सामाजिक नीतिमत्तेच्या ताजव्यांत काय दर्जाचे आहेत, याचीहि माहिती जनतेला व सरकारच्या गुप्तपोलीस खात्याला मुळींच नाही, असें मुळीच नाही. टेम्ससारख्या आंग्लहितवादी पत्रांनी संस्थानबुडव्या डलहौसीचा हौशी सूर काढून स्वदेशी राजांच्या उच्चाटनाचा मंत्र म्हटला तर त्यांत कांही नवल नाही. तो त्यांना शोभून दिसेल, इतकेंच नव्हे तर स्वदेशी पत्रांनीच स्वदेशी राजाच्या आईमाईचा उद्धार करण्यांत मोठ्या अहमहमिकेनें पुढाकार घेतला तर तीसुद्धां आंग्ल पत्रकारांना एक इष्टापत्तीच होत असते. राष्ट्रांतलेच लोक एकमेकांच्या पाडावाचा प्रयत्न करीत असतां, लाथाळीचा व गुहास्फोटाचा शिमगा खेळू लागले, तर जेतृत्वानंदांत डुलणाऱ्या राज्यकर्त्यांना तो कपिलाषष्ठीचा योग का भासू नये?
बावला खुनाच्या पहिल्याच आर्टिकलांत टैम्सनें तर एवढा मोठा गडगडाट केला की `या प्रकरणांत कोणी एखादा स्वदेशी राजा जरी असला तरी त्याचाहि हिंदुस्थान सरकारने मुलाजा राखूं नये, असा आमचा आग्रह आहे.` मुमताजसारख्या छिनाल तरुणीच्या पाय बावलासारखी एक अप्रसिद्ध व्यक्ति कांहीं क्षुद्र माथेफिरू मारेकऱ्यांच्या हातून ठार मारली जातांच, ओढून ताणून लावलेल्या संबंधावर जर इंदोर संस्थान चेचण्याची अप्रत्यक्ष सूचना करण्याइतकी हीं आंग्रजी पत्रे बेगुमान बनतात, तर पंजाबांत निष्कारण कत्तली करणाऱ्या डायर ओडवायरच्या हिंदुस्थानांतल्या आंग्लाईबद्दल परराष्ट्रीयांनी असलेच उद्गार काढले तर टैम्सप्रभृतींना ते कितपत मानवतील?
पण आंग्लराष्ट्र असा राष्ट्रद्रोह कधीच करणार नाहींत. स्वार्थासाठीं तीं एकमेकांशी कितीहि झगडली, तरी परकीयांपुढे आपली गुह्यें कधींच प्रगट करणार नाहींत. थोड्याच दिवसांपूर्वी लंडनांत खुद्द राजघराण्यातील एका राजपुत्राचें लव्हाळे लफडें उपस्थित झालें होतें. पण इंग्लिश जनता कडवी स्वाभिमानी असल्यामुळे आत्मद्रोही गुलाम हिंदूंप्रमाणे त्यांनी या प्रकरणाचा प्रस्तुत होळकर निंदेच्या गलिच्छ शिमग्याप्रमाणे, पराचा कावळा न करतां ती बातमी उगाच नांवाला एका कोपऱ्यांत अस्पष्ट भाषेत प्रसिद्ध करून ठिकच्या ठिकाणी दडपून नामशेष केली.
गुलाम हिंदूंना स्वाभिमानच नाहीं.
महाराष्ट्रीय स्वाभिमानाची प्रथम होळी केली तेव्हांच त्यांचें स्वराज्य सरणावर चढलें. आज स्वराज्याचा स्वातंत्र्याचा आणि स्वयंनिर्णयाचा केवढाही डांगोरा पिटला जात असला, तरी त्यांत स्व कोठेंच नाही. गुलामगिरीत पिचत असतां पक्षभेद पंथभेद इत्यादि भेदांचा नरकपडण्यांतच आपल्या उरल्यासुरल्या अकलेची धुळवड शेणवड खेळणाऱ्यांना स्वाभिमान ही चीज पारखी असल्यास काहीं आश्चर्य मानण्याचे कारण नाहीं. आपलेपणाची आमची जाणीवच मेली आहे. वैयक्तिक स्वार्थापुढें प्रत्यक्ष स्वकीयांच्या व स्वदेशियांच्याहि अब्रूचा होम करण्यास निरढावलेल्या माणसांत माणुसकींचा अंश तरी सांपडणें राज्य आहे काय? महाराष्ट्रीयांचा स्वाभिमान जर जागृत असता, त्यांच्यात आपलेपणाचा ओलावा असता, आणि केवळ टीचभर पोटाच्या खळगीसाठी परक्यांना चहाडचा चुगल्या सांगून आत्मद्रोही घरभेदाचा भिक्षुकीपणा त्यांनी केला नसता, तर आज ते इंग्रजी राज्यसत्तेच्या पालखेटों व त्यांच्या नोकरांच्या हंटरखाली शिस्तीच्या गोण्या वाहणारी गाढवें झालेच नसते.
महाराष्ट्रांतला इंग्रेजी राज्यसत्तेचा पाया महाराष्ट्रीयांच्या घरभेदावर आणि आत्मद्रोहावरच उभारलेला आहे, ही इतिहाससिद्ध गोष्ट धडधडीत डोळ्यांपुढे असूनही जर आम्हाला अझून एकमेकांना खाली ओढण्याची आसुरी प्रवृत्ति दाबून टाकतां येत नाहीं, तेव्हां आमची अवनत मनोवृत्ति किती सडून कुझून गेली आहे, हे न दाखवितांहि सिद्ध होण्यासारखें नाहीं काय? सारांश, स्वकीयांच्या व स्वदेशियांच्या निंदा नालस्तीवर पोट भरण्याची प्रवृत्ति हेंच सुचवितें कीं हिंदू लोकांना मुळीं स्वाभिमानच (self respect) नाही.
अर्थात् कदरबाज व स्वाभिमानी इंग्रज राजसत्तेचा वरवंटा फिरून खालसा झालेल्या खालसांतल्या गुलामांना स्वयंशासित स्वदेशी राजांचा तीव्र द्वेष व बदनामी करण्यांतच होणारा आनंद आसुरी व आत्मद्रोही प्रवृत्तींचा द्योतक आहे. या द्वेषांत व बदनामींत सत्यप्रियतेचा व अन्यायाच्या तिटकाऱ्याचा कितीहि दिखाऊ मालमसाला घातल्याचा बहाणा निंदक करीत असले, तरी ज्यांना ज्यांना या निंदकांच्या चारित्र्याचा कुळामुळासकट तपशील पूर्ण माहीत आहे, त्यांना या बहाण्यांतलें ढोंग समजत नाहीं असें नाहीं. तात्पर्य, नीतिदाक्षिण्याच्या सबबीवर होळकर सरकारची विटंबना करणाऱ्या पोटभरू पत्रांचा चालू असलेला शिमगा म्हणजे सैतानांचा बायबलपाठ होय.
या सैतानांचा नुसता नामनिर्देश करणें म्हणजे नरकांत धोंडा टाकून आपल्या आंगावर घाण उडवून घेण्यासारखें आहे, हें महाराष्ट्रांत आज तरी कोणाला नव्यानें सांगण्याची जरूरी नाही. बावला खुनाचें प्रकरण उपस्थित झाल्यापासून तो खुनी लोकांना शिक्षा होईपर्यंत महाराष्ट्रातल्या यच्चयावत पत्रकारांनी मौन धारण केलें असतां, मौज व चाबूक या दोन छिनाल वाड्मयप्रसारक पत्रकारांनी होळकरांची निर्भत्सना व बीभत्स विटंबना केली, म्हणून या दोन विवेकच्युत संपादकांना महाराष्ट्रांत एक तरी विचारवंत सत्यप्रियतेचें व नीतिदाक्षिण्याचें सर्टिफिकीट देईल, असे आम्हांला वाटत नाहीं.
मयत `भूत` `गुराखी`च्या `विक्षिप्त`पणाची घाणेरडी भिक्षुकी परंपरा चालवून, इतिहासाची पुरावृत्ति घडवून आणल्याचा कितीही आसुरी आनंद या पत्रकारांना होत असला, आणि अचकट विचकट अशा हलकट वाड्मयप्रसारावर त्यांनी आपल्या पोट्यापाण्याचा प्रश्न सोडविण्यांत कितीहि कौशल्य दाखविले असले, तरी महाराष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय व विशेषतः नैतिक क्षेत्रांत या `मौज` व `चाबुक` कर्त्यांचा भाव काय आहे? स्वतःच्या नीतिभ्रष्टतेचा व सामाजिक नालायकीचा तिळमात्र विचार न करता, केवळ `मी पत्रकार आहे` एवढ्याच भांडवलावर ह्या पत्रांनी वाटेल त्याच्या अब्रूवर निखारे ठेवून, त्यावर आपल्या उदरनिर्वाहाचे पापड भाजीत सुटावें, ही गोष्ट त्यांना व्यक्तिशः तर बेशरमपणाची आहेच, पण मराठी `जर्नालिझम` ला अत्यंत लांछनास्पद आहे. वाचकांना हे आता सांगायलाच नको की, कै. टिळकांचीही बीभत्स विटंबना करण्यास न शरमलेले संदेशकार आज चाबुकस्वार असल्यामुळे आमच्या स्पष्टोक्तीबद्दल आमच्यावरहि आपल्या वाङ्मय ड्रेनेजचा पंप सोडण्यास आतां कमी करणार नाहींत; आणि लवकरच प्रबोधनकार ठाकरे, चाबूक मौजेच्या गटारगंगेत, आपादमस्तक हबकून चुबकून निघालेले सर्वांना दिसतील. नरकांतच धोंडा टाकल्यावर आंगावर कांहीं उडालंच तर आम्हांला तक्रार करण्याची किंवा प्रत्युत्तर देण्याची कांहीच जरूरी नाही..
होळकर - विटंबना हेतु.
होळकरांच्या निंदेवर जगणारी पत्रे उघड उघड पोटार्थी. इंदोराहून कांही मलिद्याचीं पार्सलें जर ह्या सज्जनांच्या पदरांत गुपचुप येऊन पडत, तर त्यांचा चालू असलेला शिमगा तेव्हांच बंद पडला असता, असे मानण्यास अवसर आहे. या शिमग्यांत अनीतीची चीड नाही, सत्याची बाड नाही, कांही नाहीं. हा दिखाऊ दिमाख आहे. भुंक भुंक भुंकलें की माणूस त्रासून जातो आणि भाकरीचा एकादा लठ्ठ तुकडा किंवा एखादे हाडूक पुढ्यांत फेकून कुत्र्याचा भुकभुकाट बंद पाडतो. एवढीच अपेक्षा या होळकर निंदकांची दिसते. पण `शुनःकपाले लगुडप्रहार:` हीच त्यांची योग्य संभावना हैं ते विसरतात. मार्गे कोल्हापूरच्या महाराजांच्या गुप्तदानानें संदेशचें तोंड बंद झाल्याचा गवगवा पुष्कळांच्या स्मरणांत असेलच.
प्रस्तुत लेखकानें खुद्द छत्रपतींना त्याचा खुलासा विचारला असतां ते म्हणाले, "हे एक जंतर मंतर आहे. कोणी कांही बरे वाईट लिहिलें म्हणून माझ्या अंगाला कांहीं खांडकें पडत नाहींत, Money makes the mare go अशी इंग्रजीत एक म्हण आहे. पण मी पैशानें घोड्यांचीच नव्हे तर माणसांची सुद्धा गाढवें बनवितों तीं ही अशी!" कै. शिवाजीराव होळकरांनी `गुराखी` च्या भाट्याची तर फारच योग्य संभावना ठेवली. फर्स्ट क्लास प्रवास खर्च पाठवून त्याला इंदोरास आमंत्रण दिलें. भाट्याला वाटलें कीं माझा शिमगा फळाला आला. खुद्द शिवाजीराव जातीने स्टेशनवर सामोरे गेले. हे सन्मान्य पाहुणे गाडींतून उतरतांच वेटिंगरूममध्ये नेऊन हंटरखालीं यथास्थित चोप देऊन परत मुंबईला रवाना केलें. शुनःकपाले लगुडप्रहार: हाच होळकरी मलिद्याचा `मेन्यू` आहे, हें मौज चाबुक कर्त्यांनी लक्षांत ठेवावे. सारांश, श्रीमंत तुकोजीराव होळकरांचे निंदक माजी गुराखी भूत प्रभृतींचे सांप्रदायिक आहेत, एवढेच लक्षांत ठेवलें म्हणजे त्यांच्या छिनाल शिमग्याला काय किंमत द्यायची ती विचारवंतांना सांगणेंच नको.
काश्मिरचे सर हरिसिंग आणि इंदोरचे श्रीमंत तुकोजीराव यांच्यावर दुसरा असा एक आक्षेप घेतां येईल कीं लक्षावधि प्रजाजनांच्या सुखदुःखाची जबाबदारी पार पाडायची असल्यामुळें, सामान्य माणसांप्रमाणे यांची बुद्धि कमकुवत व दृष्टी आकुंचित असतां कामा नये. ज्यांना रॉबिनसन मुमताजसारख्या चंवढाळ नारी बोलता बोलता फसवितात त्यांची बुद्धी तीव्र व दृष्टी धोरणी कशी मानावी?
हे कशाचे मुत्सद्दी आणि डिप्लोमॅटस? शंका बरोबर आहे. दोघेही लव्हाळ्यात सपशेल फसले. ही फसवणूक त्यांच्या कमजोर धोरणांमुळे झाली, असें जरी क्षणभर मानले, तरी एक गोष्ट विसरून भागणार नाही की ते विश्वासघाताला बळी पडले. सर्व घातक पण विश्वासघातापुढे कोणाची कांही अक्कल चालत नाही. मनुष्य यच्चयावत सर्व व्यवहार विश्वासावरच चालतात. अशी कोणती गोष्ट आहे. की जिच्या सांगतेसाठी विश्वासाची तिळमात्र जरूर लागत नाही? एकहि अढळणार नाही. आजपर्यंत ज्या मोठमोठ्या राज्यक्रांत्या झाल्या, त्यांत पराजित नृपतीला विश्वासघातानेंच धुळीला मिळविलें. एवढा मोठा भूतो न भविष्यति नेपोलियन बोनापार्ट; पण त्याची सुद्धां अखेर विश्वासघातानेच मान कापली गेली. विश्वासघातापुढें बृहस्पतीचीही अक्कल ठार व्हायची, तेथें हरिसिंग होळकरांचा पाड काय? जेथे धडधडीत विश्वासघात होत आहे, तेथें फसलेल्या मनुष्याची कींव केली नाहीं तर निंदा करण्यास मुळींच वाव नसतो.
मुमताज महामायेचा थैमान
बावलाच्या खुनांत सुरू झाला आणि त्याची अखेर तिघांना फाशी व चौघांना हदपारी यांत झाली. याशिवाय धरपकड, तात्पुरती कैद, साक्षीपुराव्यासाठी हेलपाटगिरी, झडत्या, बाचाबाची, उलटसुलट तपासण्या, वगैरे अनंत भानगडीत शेंकडों लोकांची धुळपट निघाली, ती वेगळीच. शनिवार ता. २३ मे १९२५ रोजी सेशन कोर्टानं या थैमानाचा सर्व इतिहास तपासून ज्यूरी व न्यायमूर्ती यांनी एकमतानें कमाल कसोशीचा न्याय दिला. या न्यायामुळे फांसावर चढणान्या तिघा आरोपींपैकी पोंडे व दिघे हे दोघे अगदी भरज्वानीचे तरुण असल्यामुळे दुष्कृत्याची चीड आली तरी त्यांच्या दुर्दैवाबद्दल करुणा उत्पन्न झाल्याशिवाय रहात नाही. तारुण्याच्या उमेदीला विवेकाची दाबणी (ब्रेक) नसली म्हणजे मनुष्याच्या हातून केवढे भयंकर दुष्कृत्य होतें हैं पोंडे व दिघे यांच्या चरित्रावरून स्पष्ट दिसून येईल. राजेलोक कशानें खूष होतात, याचा वास्तविक कोणालाच थांग लागत नाही, इतके ते बहुशः खोल मनाचे असतात. लोकसंग्रहाच्या बाबतीत ते प्रत्येक व्यक्तीची पूर्ण पारख खोल करून त्याविषयी आगाऊच आडाखा अजमावून ठेवतात, तरी बाह्यतः भल्या बुऱ्याला एकाच दावणीचा आश्रय देतात.
त्यामुळें प्रत्येकाला असें वाटतें की महाराज माझ्यावर विशेष खूष आहेत. पण खुद्दांचा आडाखा कांही न्याराच असतो. के. शाहू छत्रपति या लोकसंग्रहाविषयी बोलत कै. तेव्हा म्हणत "आमची ही एक मेनेजरी आहे. येथें माणसांतले सर्व प्रकार आहेत. जनावरांत कोल्ह्यामाकडापासून तो सिंहापर्यंत जसे आमच्या संग्रही आहेत तसेच मातृगमन्यापासून तो थेट अब्बल ब्रह्मज्ञान्यापर्यंतची माणसेंहि या मेनेजरींत आम्हाला ठेवावी लागतात." मुमताजच्या थैमानांत काशी जाणारे पोडे दिये व हदपार होणारा फणसे, या तिघांखेरीज बाकीचे लोक एकजात लोफड दिसतात. या सर्वांनी महाराजांच्या `खुषी`चें काहीतरी काल्पनिक चित्र रंगवून, त्यांच्या प्रसन्नतेवर स्वतःच्या ऐश्वर्याची परासीमा गांठण्यासाठी हा गुप्त कट रचला, आणि केवळ काट्यावर धड टाकावी तशी अचाट बुद्धी चालवून बळेंच लक्ष्मी मिळविण्याचा हा उपदव्याप केला असे दिसून येते.
या गुप्त कटाचे बातबेत ठरवितांना धाडसी कृत्यांचे सिनेमा चित्रपट त्यांना बन्याच अंशी उत्तेजक प्रेरक व स्फूर्तीदायक झाले असावे असे अनुमान करण्यास पुष्कळ जागा आहे. अचाट धाडसांचे सिनेमा पाहतांना सर्वसामान्य माणसे आश्चर्य व कौतुक करतात; पण उमेदवार व महत्त्वाकांक्षी तरुणांवर त्यांचा कसला भयंकर परिणाम होणें शक्य आहे. याचा विचारवंतांनी विचार करावा. बहुतेक धाडशी सिनेमा फिल्मांत लाखों रुपयांचे डबोलें, एक चटक चांदणी मुमताज आणि तिच्या प्राप्तीसाठी धडपड करणारी कटवाल्यांची एक टोळीच असते. त्यांत मोटारी असतात, आगगाड्या असतात, गुप्त भाषेचे टेलीग्राम असतात, लग्नापूर्वी हुंडा शफी अहमद असतो, दिसेंबरांत `कॉलेज जॉईन` करणारा पोंडे असतो, नाशिक रस्त्यानें `फ्रूटस्` पाठविणारा `तराणावाला` असतो, नतनजान असते, मसणजान असते, सर्व कांही असतें. बावलाचा खून पाडण्यासाठी रचलेला हा `मुमताजकट` म्हणजे नेहमी आपण पहातों तसल्या धाडशी कृत्यांच्या सिनेमापटाची हुबेहूब नक्कलच नाही काय?
सिनेमाने करमणुकीच्या साधनांत कितीहि भर टाकलेली असली तरी त्याचेहि दुष्परिणाम समाजाला कसे भोगावे लागत आहेत ते पहा. सेशन कोर्टात प्रत्येक मुद्याचा भूस न् भूस निघाला, पण त्यांत `मुमताज ही होळकरांची रखेली होती` यापेक्षां अधिक कसलाही मुद्दा सिद्ध झाला नाहीं. सेशन जज्बानी म्हटल्याप्रमाणे या सर्व कटाचें मूळ इंदोरांतच आहे, हें खरें धरलें, तरी त्या मुळाची पाळें खुद होळकर सरकारच्या बुटाच्या टांचेपर्यंत नेऊन भिडविण्याइतका कसलाह पुरावा पुढे आलेला नाहीं. खुद्द महामायेच्या जबानीतहि तिने याविषयी एक अवाक्षर काढलेलें नाही. फणशाच्या जबानीवरून या सर्व कटाचा उगम, राजद्रोह व पैशाची अफरातफर या आरोपांवरून इंदोरच्या तुरुंगांत खडी फोडीत असलेल्या शंकरराव गावड्यांतच असावा, असे मानण्यास पुष्कळ जागा आहे. अर्थात् या कटांत होळकर सरकारचा संबंध कसाबसा ओढूनताणून आणण्यांत ऐदी गप्पीदासांना व बुभुक्षित पत्रकारांना मोठ्या दीर्घदृष्टीचा व मुत्सदेगिरीचा भास होत असला, तरी तो चुकीचा गैरसमजुतीचा व बहुतांशी निवळ मत्सराचा परिणाम आहे, यांत मुलीच शंका नाही. हुजऱ्याचा हौसहोल्ड ऑफिसर बनलेला शंकरराव गावडे म्हणजे
इंदोरचा त्रिंबकजी डेंगळा
म्हटला तरी चालेल. प्याद्याचा फर्जी बनलेल्या ह्या प्राण्याच्या हालचाली श्रीमंत तुकोजीरावांना माहीत नसाव्या, असे मानतां येत नाहीं. नाकापेक्षा जड बनलेले हें मोती इंदोरांत एक जाडे पेंड होऊन बसले होते. पण पापायें माप भरतांच होळकर सरकारने या पेंडालाहि पेंड चारण्यास कमी केलें नाही. लहानाचा थोर व हुजऱ्याचा खाजगी कारभारी अशा महान अधिकारावर चढविलेल्या शंकरराव गवड्यालाहि अन्यायाची परमावधि होतांच न्यायाच्या चरकांत बोलबोलतां ताडकन् चिरडून भरन काढणारे होळकर सरकार, मोटर ड्रायव्हर बहादुरशहा व अबदुल लतिफ, असल्या लोफड लोकांच्या कटाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मान्यता देतील, ही कल्पना करणारें डोकें फाजील कल्पक म्हणून सांदीत टाकलेलें बरें!
आतां अखेर ज्या महामाया मुमताज भवानीच्या छिनाल थैमानामुळे एक तरुण ठार मारला गेला, तिघे फासांवर चढले व चौधे हद्दपार झाले, तिच्या बुद्धिवैभवाची काकड आरती करून हा निबंध समाप्त करू. जस्टिस व्रंप ह्यांनी मुमताजविषयीं असा अभिप्राय दिला आहे की "या मुमताझचे शिक्षण जरी बेतास बातच आहे तरी जात्या ही कुशाग्र बुद्धीची असून तारतम्य जाणणाऱ्या डोक्याची (clear head) आहे." जिच्या पाय इतक्या जणांची डोकी मारली गेली, ती बाई डोक्याची नव्हे असें कोण म्हणेल? असा कोटिक्रम सहज कोणाला सुचला तर तो निव्वळ विनोद न उरतां यथार्थ ठरेल. तब्बल दहा तास न डगमगतां जिनें क्रॉस तपासणींत प्रश्नांची उत्तरें खडाखड न कचरतां दिली त्या बाईची गणना सामान्यांत कोण करील?
`पट्टीस दे पावली` पैकी ही साधीभोळी मावली खास नव्हे. होळकरी डबोलें लांबविण्यासाठी प्रथमपासूनच ठिकठिकाणच्या पोलिस कमिशनरांना स्वसंरक्षणार्थ गुप्त अर्ज पाठविण्याची मुमताझची धोरणी कारवाई पाहिली की या महामायेच्या बुद्धिप्रभावाचें खरोखर कौतुक वाटतें. `चाबूक` स्वाराला कळायला दहा जन्म घ्यावे लागतील. केवळ स्वार्थासाठी बेइमान होण्याची अवदसा जर मुमताला आठवली नसती, तर याच तिच्या `क्लियर हेड`ची सर्वत्र तारीफ झाली असती. राजकारणी डांवपेच लढविण्याइतकी चाणाक्ष बुद्धिमत्ता हिच्यांत आढळल्यामुळेंच कादचित श्रीमंत होळकरांनी ह्या तरतरीत तरुणीला आश्रय दिला नसेल कशावरुन? पण अखेर ती आपल्या जातीवर गेली म्हणूनच तिच्या सर्व बुद्धिवैभवाची आतां काळीकुट्ट माती झाली. आईचा, सावत्र बापाचा आणि महमदअल्लीसारख्या पोटभरू पागलांचा तिनें आपल्याभोवती जो गुप्त गराडा घालून घेतला, त्यामुळेंच तिला होळकर सरकारचा विश्रवासघात करण्याची कुबुद्धी आठवली आणि अखेर बाजारबसवेपणाची दीक्षा घेण्यातच तिच्या सर्व मनोरथांची अखेर झाली.
जस्टिस व्रंप ज्यूरीला म्हणतात "असल्या बाईच्या भोंवती (महमद अल्लीसारखे) जे लोक जमा झाले होते, त्यांत त्यांचा काहीं उच्च उद्देश (high motive) असेल असे मानतांच येत नाही." यावरून मुमताझ कितीही तरतरीत डोक्याची असली, तरी डबोल्याचें घबाड पचविण्यासाठी तिने आपल्या भोंवतीं जमा केलेल्या `जिवाभावाच्या माणसां`मुळेच तिचा जीव धोक्यांत पडून आणखी आठ जीवांचा जीव गेला! जिच्या तारूण्याच्या भर अंमदानीला इतक्या भयंकर नरमेधाची आहुती पडली, तिचें पुढील आयुष्य कसें काय जाणार आहे.
तुज ठावे ईश्वरा!
ॐ शांतिः शांतिः शांतिः