कुमारिकांचे शाप
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
पहिल्या आवृत्तीची माहिती
कुमारिकांचे शाप
केशव सीताराम ठाकरे
यांनी दादर-स्टुडंटस सोशल युनियन संस्थेच्या विद्यमानें
ता. २३ जून सन १९१८ रोजी दिलेले व्याख्यान
प्रकाशक
यशवंत शिवराम राजे,
मिरांडाची चाळ, दादर
मुद्रक
तत्त्वविवेचक छापखाना,
मुंबई
प्रकाशनवर्ष १९१९
।। कुमारी श्री स्नेहलतेचा जयजयकार असो ।।
कुमारिकांचे शाप
(केशव सीताराम ठाकरे यांनी दादर-स्टुडंटस सोशल युनियन संस्थेच्या विद्यमानें
ता. २३ जून सन १९१८ रोजी दिलेले व्याख्यान.)
लग्नसराई संपली. सबंध वर्षभर घरोघर आणि दारोदार मुलींसाठी ‘स्थळ शोधीत भटकणा-या गरजवंत बापांच्या पायांना विश्रांति मिळाली. आपल्या ‘उरावरची धोंड’ निघाली म्हणून मुलींच्या आई हुश्श हुश्श करीत बसल्या. ‘यंदा कर्तव्य आहे’ म्हणणा-या कित्येकांच्या दोन हाताचे चार हात झाले आणि स्वतःच्या ‘हातापायांची काळजी’ कणा-या कित्येकांनी आपल्या द्वितीय किंवा तृतीय पुनर्विवाहाचा ‘बार उडवून’ पूर्वीच्या चार आणि सहा हातांचा गुणाकार अनुक्रमे सहांत आणि आठांत करून घेण्याची अमोल संधी वाया जाऊ दिली नाही. कित्येकजणांनी हातांच्या या गुणाकार बेरजेत प्रत्यक्ष न पडता, ‘लग्न झाले नसले तरी मांडवाखालून गेलो आहे,’ ही फुशारकी मारण्याचा हक्क प्राप्त करून घेतला. ठिकठिकाणच्या लग्नाच्या मेजवान्या झोडून झोडून कंटाळलेली व-हाडी मंडळी ढेकर देत स्वस्थ पडली. केशरभात, बासुंदी, पुरी, बेसनाचे लाडू खातखात त्यांच्या मसाल्याचा हाताला लालेला खमंग वास घेत घेत कित्येकजण मेजवानीच्या थाटाची आणि व्याह्याच्या आग्रही स्वभावाची तारीफ करीत भाटांप्रमाणे घरोघरी पुराणे सांगत फिरत आहेत. कित्येक मध्यस्थ ‘लग्नाचा सौदा’ – नव्हे, ‘लग्नाचा योगायोग’ जुळवून आणण्यात यशस्वी झाल्यामुळे ‘नको नको’ म्हणत असताही दोन्ही बाजूंच्या सोय-यांनी आहेर केलेली पागोटी-उपरणी अंगावर घेऊन मिरवू लागले. कालच्या कारट्या आज ‘माझी बाई ती’ झाल्या. कालच्या कुमारिका आज खाली मान घातलेल्या सासुरवाशिणी किंवा वरमानेच्या पट्टराण्या झाल्या. मुलीची धोंड मानेवर बाळगून बाळगून वाकलेल्या बापाची पाठ आज ताठ होऊन, ते वर मानेने चार जौघांत हिंडू फिरू लागले. बगी ‘उजवली’ म्हणून तिची आईसुद्धा आजपासून ‘उजळमाथ्याने’ तांदळाचे चार दाणे ओच्यात घेऊन देवळांत जाऊ लागली. दाणेवाले, कापडवाले, सोनार, पटवेकरी, उपाध्ये, भटभिक्षूक, ताशेवाले, बँडवाले, वाजंत्री, नळेचंद्रज्योतीवाले झाडून सारे लग्नसराइला दुव्वा देत आता आढ्याला तंगड्या लावून निवांतपणे झोपा ताणू लागले. थोडक्यात वर्तमानपत्री सांच्यात बोलायचे म्हणजे सालाबादप्रमाणे यंदाही
लग्नसराई मोठ्या आनंदात गेली
लग्नसराई आणि ती आनंदात गेली! या शब्दरचनेचा अर्थ तरी काय? लग्नसराई आणि आनंद, ही विचारसरणी जर बरोबर अर्थपूर्ण होत असेल, तर राघो हुज-याचे किंवा तात्या भिल्लाचे बंड आणि आनंद, ही विचारसरणी तरी अनर्थपूर्ण का मानावी? गेली शंभर वर्षे आत्मवंचक आयुष्यक्रमांत गुलामगिरीची रकटी पाळण्यात आनंद मानणा-या या नादान महाराष्ट्राला आजकाल कोणत्या गोष्टीत आनंद वाटेल ते काही सांगताच येत नाही. बारशाच्या घुग-या खातानाही याला आनंद होतो आणि तेराव्याचे लाडू झोडतानाही त्याला आनंद होतो. शुद्ध विवाह-संस्काराचा नुसता फार्स करणा-या आमच्या लोकांनी लग्नसराईत आनंद मानण्यासारखे आता काय राहिले आहे? आपल्या मुलीला ‘स्थळ’ शोधण्यासाठी जोडेफाड करीत वणवण हिंडणा-या आणि सरतेशेवटी शेकडो रुपयाची किंमत देऊन विकत आणलेल्या जावईबुवांच्या गळ्यात मुलीने माळ घातली म्हणजे ‘सुटलो’ म्हणून दीर्घ उसासा टाकून डोळ्यातून कोसळणारा अश्रूंचा लोंढा उपरण्याचे सावरणा-या बापाची परिस्थिती जाणणा-या किंवा तिचा प्रत्यक्ष अनुभव घेणा-या कोणत्याही इसमाला लग्नसराई म्हणजे आनंदाची पर्वणी ही साळसूद विचारसरणी क्षणभरसुद्धा पटायची नाही. वरशोधासाठी घराबाहेर पडल्या घटकेपासून तो अखेर व-हाड्यांना यथास्थित लाडू चारून त्यांचा ‘या बरे’ म्हणून निरोप घेण्याच्या घटकेपर्यंत बिचा-याला ज्या हालअपेष्टा, अपमान, निर्भर्त्सना, पाणउतारा, फसवाफसवी, द्रव्यसोस, कर्जाचा फास इत्यादि अनेक आधिव्याधी भोगाव्या लागतात, त्या जर कोणी ध्यानात आणील, तर त्यालासुद्धा लग्नसराई म्हणजे
शुद्ध भामट्यांचा बाजार
आहे, असे वाटल्याशिवाय खास राहणार नाही. मुलीच्या जन्मातला अत्यंत महत्त्वाचा, मांगलिक आणि वंशोद्धारक असा तिचा विवाह घडवून आणणा-या आपल्या यजमानाचे होणारे सांपत्तिक आणि मानसिक धिंडवडे पाहून प्रत्येक मुलीच्या आईच्या – मग ती सख्खी असो वा सावत्र असो – आणि खुद्द मुलीच्याही आंतड्याला पडणारे ते निराशेचे आणि मानखंडनेचे पीळ पाहिले, तर राजकीय स्वातंत्र्यासाठी झडगडणारे आम्ही लोक सामाजिक क्षेत्रांत किती जुलमी आणि अरेरावी वर्तन करतो, हे आणखी स्पष्ट करून सांगण्याची जरूरच नाही.
जाचक – नव्हे प्राणघातकच – अशा मारवाडी पद्धतीने वधूच्या बापाला हरएक बाबतीत पिळून काढण्याचे वरपक्षाचे नवे जुने मार्ग पाहिले म्हणजे राजकीय क्षेत्रांतील ब्युरोक्रॅटांच्या स्वच्छंदी जुलमांना हातबोटे चोळण्याचा आम्हाला काय अधिकार? विवाहसंस्कारासारख्या ईश्वरप्रणित मंगलविधीच्या सोवळ्या नावाखाली, असंख्य दात असलेल्या सामाजिक रूढींच्या करवतीने आपल्या प्रत्यक्ष सोय-यांचा गळा कापणा-या वरपक्षीय नराधमांच्या द्रव्यशोषणांच्या लीला पाहिल्या म्हणजे परकीय राजसत्ते देश पिळून काढला म्हणून निषेध करून हातपाय आपटण्यापूर्वी या स्वदेशी सभ्य टगांची प्रथम हद्दपारी करणे आवश्यक आहे. आम्हां आर्याची विवाहसंस्कार-पद्धती अत्यंत शुद्ध, सात्विक आणि पारमेश्वरी इच्छेच्या मूलतत्त्वांबरहुकूम ठरविलेली अशीच असल्याबद्दलची कित्येक शतकांची साक्ष आहे. ख्रिस्तीशतकांपूर्वीपासून तो आजदीनतागायत या भरतखंडात- विशेषतः या महाराष्ट्रात – जे जे परदेशी फिरस्ते येऊन गेले, त्यांचे लक्ष या विवाहविधीने आकर्षण केल्याचे दाखवे ठिकठिकाणी सापडतात. आमच्या हिंदु समाजातील गृहव्यवस्थेचे, गृहस्थधर्माचे, गृहिणीच्या आणि गृहस्थाचे मनोवेधक चित्र रेखाटून, त्याच्या उत्कृष्टत्वाचे सारे श्रेय आमच्या विवाहपद्धतीला देण्यात अनेक पाश्चात्यांनी स्तुतिस्तोत्रांचा आमच्यावर अगदी वर्षाव केला आहे, आमच्या थोर प्राचीन पूज्य पूर्वजनांनी परमेश्वरतुल्य ऋषिप्रणित विवाहसंस्कार-पद्धतीचा पुरस्कार केला, त्या संस्काराचा मूळ आध्यात्मिक नीट जाणून आपालले विवाह केले आणि गृहस्थ-गृहिणी धर्म अक्षरशः पाळला, म्हणूनच आल्या अव्वल संस्कृतीने, अनुपमेय पराक्रमाने आणि ओजस्वी बलाने सा-या जगाला थक्क करून सोडणारी असंख्य नारी-रत्ने त्यांच्या पोटी निर्माण झाली. आमच्या राष्ट्राच्या सांप्रतच्या मृत्पिंडावस्थेला जी अनेक कारणे आणि पातके आमच्याच हातून घडली आहेत, त्या कर्माच्या शिरोभागी
शुद्ध विवाहसंस्कारांची हेटाळणी
दोष मोठ्या ठळक अक्षरांनी लिहून ठएवला पाहिजे. सांप्रतची कंत्राटवजा लग्ने हा एक सट्ट्याचा बाजार होऊन उठला आहे. आमची अलिकडची लग्ने हा एक मारवाडी व्यापार बनला आहे. आमची चालू विवाहविधी हा एक उचल्यांचा आणि भामट्यांचा राजरोस धंदा झाला आहे. अधार्मिक कल्पनांच्या सरपणात यथार्थाची चूड पेटवून भडकविलेल्या या लग्मसत्रांत लाखो कुटुंबांची आहुती पडलेली आहे आणि दरसाल पडत आहे. या सत्रांत कोट्यवधी अनाथ अबला कुमारिकांचे आणि तिच्याबरोबर तिच्या पित्याच्या कुटुबांचे बळी पडलेले आहेत. आमच्या प्रचिलत व्यापार सट्ट्याच्या विवाहपद्धतीत मानापानाची, रुसव्याफुगव्याची, द्रव्यशोषणाची, अडीअडवणुकीची आणि वरपक्षाच्या फाजील लब्धप्रतिष्ठतेची जी सोंगेढोंगे अलीकडे घुसविली आहेत, त्यांच्या उर्मट पुरस्कर्त्यांनी आपले डोळे जरी ताणताणून फाडले, तरी विवाहपद्धतीत घुसलेल्या अनेक डाकेखोर व पठाणी रूढींचे समर्थन करणारा एकही प्राचीन शास्त्राधार त्यांना सापडणे शक्य नाही. या आपमतलबी, घातकी समाजसत्वविध्वंसक रूढी आमच्या कशा घुसल्या, याचे कोरडे इतिहास-संशोधन करण्याचीकाही जरूरी नाही; या दुष्ट राक्षसी रूढींचे आज आम्ही
बंदे गुलाम झालो आहोत
ही गोष्ट कोणीही अमान्य करणार नाही. अर्थात दिवसाढवळ्या दरोडे घालून आमच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाचे शोषण करणा-या या रूढींचे ज्या अर्थी आम्ही दास झालो आहोत, त्या अर्थी आम्हास आता ‘आर्य’ म्हणवून घेण्याची लाजच वाटली पाहिजे, इतके आम्ही या विवाह-संस्कारांच्या बाबतीत नादान बनलो आहोत. विवाह करावयाचा का? तो एका विशिष्ट शास्त्रीय पद्धतीनेच करावयाचा का? विवाहसंस्काराचे महत्त्व काय आहे? विवाहामुळे कोणकोणत्या आध्यात्मिक जबाबदा-या आपणांवर येतात? विवाहविधीत वधूचे महत्त्व काय आहे? इत्यादि अत्यंत महत्त्वाच्या प्राचीन दूरदृष्टी ऋषींनी पूर्ण विचार करून जे सिद्धांत ठरवून दिले, त्या सिद्धांतांना लाथाडून देऊन ज्याअर्थी आम्ही इहलौकिक आणि पारलौकिक सौख्याची अपेक्षा करतो, त्याअर्थी उद्या कोणी त्रयस्थाने
तुम्ही शुद्ध नर्मदेचे गोटे आहात
असा आमच्यावर शेरा मारला, तर त्यात त्या त्रयस्थाचा कोणता दोष?
प्राचीन ऋषिप्रणित विवाहसंस्कारांतील निरनिराळ्या मंगल प्रसंगाचे श्लोक, मंत्र व ऋचा वाचल्या म्हणजे विवाहविधीत वधूला व वधूपक्षालाच जास्त महत्त्व दिलेले आढळून येते. वरपक्षाचा उद्धार करणारी गायत्री वधू. वराचा वंश वाढविणारी वल्ली वधू. वराला ब्रह्मलोकाची प्राप्ती करून देणारी कामधेनूही वधूच. वधू नसेल तर नुसत्या सडेसोट बारगिरांची किंमत ती काय? परंतु विवाह-संस्काराबद्दलची ही धार्मिक किंवा आध्यात्मिक दृष्टीच फुटल्यामुळे, आजकाल विवाह म्हणजे सट्ट्याचा बाजार झाला आहे. वाग्दान कन्यादानादि विधि निखालस नाटकी थाटाचे बनले आहेत. उपाध्ये म्हणजे चरकावरचे शुद्ध नंदीबैल आणि वधूचा पिता म्हणजे वराच्या खाटीक बापाच्या हातातला गरीब बोकड! उज्वल विवाहसंस्काराला इतक्या नीचतम दुरावस्थेला आणून ठेवणा-या लोकांना सामाजिक किंवा राष्ट्रीय चळवळीत जर नेहमी अपयशाची खापरेच मिळत गेली तर त्याचा दोष परमेश्वराच्या माथी का म्हणून?
आमच्या धार्मिक, सामाजिक व राजकीय जीवनाचा पाया या विवाहसंस्कारावरच मुख्यत्वेकरून उभारलेला आहे. तो जोपर्यंत नीट व्यवस्थित सांभाळण्यात आला होता तोपर्यंतच महाराष्ट्राच्या कर्तबगारीचा महिमा जिवंत होता. जेव्हा या पायावर रूढीभ्रष्ट विवाहसंस्काराच्या तमाशाचे जलसे सुरू झाले तेव्हापासून महाराष्ट्राच्या ऐहिक वैभवाला ओहटी लागली. ज्या देशात किंवा समाजांत विवाहविधीची थट्टा करण्यात येते, विवाहसंस्काराला कंत्राटाचे स्वरूप देण्यात येते किंवा विवाहाचा खरा आध्यात्मिक उद्देश लाथाडून टाकण्यात येतो, ती राष्ट्रे किंवा ते समाज आर्थिक अभ्युदयाच्या कितीही उंच शिखरावर चढले, तरी नैतिक दृष्ट्या ती कमजोर असल्यामुळे, परिस्थितीचा नुसता चुटपुटता धक्का लागताच, त्यांच्या वैभवाचा डोला कसा घडघडून खाली कोसळतो, याची अनेक उदाहरणे सध्याच्या पाश्चात्य महायुद्धाने बरीच उघडकीस आणली आहेत. विवाहविधी सट्ट्याच्या किंवा कंत्राटाच्या स्वरूपात होऊ लागले म्हणजे त्यापासून जी संतती पुढे निर्माण होते, ती संकरापेक्षा क्षुद्र अशीच व्हायची; मग आईबाप-सध्याच्या भ्रष्ट वर्णाश्रमाच्या भाषेत बोलायचे तर – जरी एकाच जातीचे असले, सगोत्र, सपिंड, सप्रवर नसले, तरी त्यांच्या संततीवर शूद्रातिशूद्रत्वाचा शिक्का पडल्याशिवाय खास राहत नाही. धार्मिक ग्रंथांतील वचनांचा कीस काढून कोरड्या विद्वत्तेच्या दिमाखावर शालजोड्या फडकावणारे वेशासंपन्न ‘नन्दान्तं क्षत्रिय कुलम्’ म्हणून कितीही आक्रोश करोत, आज आमच्या हिंदु समाजाची सामाजिक स्थिती जर कोणी पृथःकरण केली जर आजला हा सारा समजा शूद्रातिशूद्रांनीच गजबजून गेला आहे, असा निकाल त्याला द्यावा लागेल. हिंदु समाजाची विवाहपद्धती व्यापारी पद्धतीवरच येऊन ठेपल्यामुळे, सारी प्रजा ‘दे वाण घे वाण’ इतक्या क्षुद्र बुद्धीच्या कर्तव्याच्या कल्पनेने घेरलेली शूद्रप्राय अशीच दृष्टीस पडते.
मित्रहो! हिंदुसमाज आजला शूद्रांपेक्षाही शूद्र अशा नीचतम दुरावस्थेला येऊन भिडला आहे, हे माझे विधान ऐकून तुम्हाला कदाचित राग येईल; त्याला माझा नाइलाज आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे याचे तुम्ही सूक्ष्म अवलोकन करा म्हणजे सांप्रत या हिंदुस्थानात पूर्वीचे चार वर्ण मुळीच अस्तित्वात नसून आता सारा एकच वर्ण उरला आहे आणि तो कोणता म्हणाल तर शूद्रवर्ण हा होय. हल्ली ब्राह्मण, क्षत्रिय वगैरे जी नावे आपण ऐकतो, त्या नुसत्या जाहिरातीच्या पाट्या आहेत, पूर्वीच्या वर्णाश्रम-इतिहासाचे स्मरण करून देणारे ते निर्जीव ‘मेमोरियल स्टोर इन्स्क्रिपशन्स’ – शिलालेख आहेत; या पलिकडे आता त्यात काय अर्थ राहिला आहे? वर्णाश्रमपद्धतीचा कोरडा दांभिक अभिमान बाळगणारे बरेच आहेत परंतु त्या पद्धतीचे धर्म प्रत्यक्ष आचरणारे लोक कोठे आहेत? मित्रहो! धर्माचे आचरण करावे अशा सद् बुद्धीचा अंकुर हृदयांत जिवंत असलेले महत्वाकांक्षी लोक आजलाही मुळीच नाहीत, असे मात्र मुळीच नाही; आहेत-बरेच आहेत. परंतु अंतःकरणात उद्भूत होणा-या महत्वाकांक्षएला प्रत्यक्ष आचरणात आणण्याची आज त्यांच्या हातात शक्तीच राहिलेली नाही – म्हणजे थोडक्यात सांगावयाचे तर हृदयात जरी ब्राह्मणत्वाचा किंवा क्षत्रियत्वाचा अंकुर जिवंत दिसतो तरी हात मात्र शूद्रवत् आचरण करितात, इतकी ही जबरदस्त प्रतिक्रिया होण्याचे कारण काय? याचा, मित्रहो! जरा शांतपणाने विचार करा, म्हणजे मग तुमचे तुम्हालाच कळून येईल की सध्या हिंदुसमाज शूद्रवत झाला आहे की नाही तो!
या सर्व भयंकर क्रांतीच्या बुडाशी एक दुर्जेत, घातुक आणि भयंकर महापातक आहे. या महापातकाच्या विषारी ज्वाला गेली कित्येक वर्षे आमच्या सामाजिक सौख्याची, सामाजिक आकांक्षांची आणि सामाजिक बंधनाची राखरांगोळी करून, आम्हाला राष्ट्रकार्यातही दिवसेंदिवस नालायक आणि कमजोर बनवीत आहे. या महापातकाच्या हलाहल विषाने आमचे सांपत्तिक वैभव शोषल्यामुळेच आज आम्ही निःसत्व, उच्छिष्ठभोजी आणि सर्वच बाबतीत परक्यांच्या तोंडाकडे पहाण्याइतके हीनदीन झालो आहोत. या महापातकाच्या तडाक्यात आमचे आम्ही होऊन गेल्यामुळे आमच्या कर्तबगारीची धार पार बोथट होऊन, कर्तव्याची मर्यादाही इतकी संकुचित झाली आहे की पुल्लिंग म्हणजेच पौरुषत्व इतक्या क्षुद्र भावनेमुळे आज पिढ्यान् पिढ्या सामाजिक आणि राष्ट्रीयकार्यात आमचा काडीचाही उपयोग न होता,
जन्मा आला हेला, पखाली वाहतां मेला
अशा रीतीने सरणाची वाट धरावी लागते. महत्वाकांक्षेने हृदयात जरा कोठे जोर करावा तो आमच्याच हातांनी आमच्याच मुस्कटात भडकावून घेण्यापलीकडे विशेषसे काहीच घडत नाही. या महापातकाचे जंतू आज आमच्या हिंदुसमाजात सर्वत्र अप्रतिबंध बोकाळत असल्यामुळे आमच्या शुद्ध बुद्धीला भ्रंश उत्पन्न झाला आहे; अर्थात् अवनति हीच उन्नती असल्या खोट्या कल्पनांच्या शाबरी मंत्रांनी आमच्या नसांतील रक्तात बिघाड झाला असल्यास त्यात काय नवल? या महापतकाचे समूळ उच्चाटन आजपर्यंत न झाल्यामुळे आजला सारा हिंदुसमाज विषम विवाहाच्या संततीने गजबजून गेला आहे. या विषम संसतीला ख-या स्वाभिमानाचा लवलेशही नसल्यामुळे, आपल्यामध्ये जी हल्ली आत्मवंचक परप्रत्ययनेय बुद्धि संचारलेली आढळते, तिची आजकाल मोठी चलती चाललेली आहे, आणि त्रयस्थ लोकांनी या चलतीचा फायदा घेऊन आमच्याच हातून आमच्या राष्ट्राचा द्रोह करविण्याचा आजपर्यंत खासा उद्योग केला. मित्रहो! किंचित् खोलवर विचार करा. संस्कारपूर्ण व प्रेमपूर्ण अशा पद्धतशीर विवाहाची आम्ही जर संतती असतो, तर आजकाल आमच्या समाजात जी –
देशद्रोही लोकांची बजबजपुरी
माजली आहे ती तशी कधीच माजती ना! नेपोलियन बोनापार्ट म्हणत असे की ‘‘A man who fights against his country is a child who would kill his mother.’’ (जो मनुष्य स्वदेशाविरुद्ध शस्त्र उचलतो, तो आल्या आईचा खूनही करायला चुकणार नाही.) यांतील तथ्य काय आहे? समरांगणात पोलादी अंतःकरणाने लाखो शत्रूंना चिरडून फस्त करणारे वीर महावीर ज्या मातृप्रेमाचे नुसते स्मरण होताच हात डोडून विनम्रतम भावाने त्याला प्रणिपात करतात, त्याच मातृप्रेमाची पातृदेवीच्या त्या उज्वल भक्तीची – पर्वा न करणा-या राक्षसी कोटीतल्या इसमाची मनोवृत्ती कोणकोणत्या परिमाणूंची बनलेली असेल बरे? या एकाच मुद्दाचा आपण जर किंचितं निःपक्षपात बुद्धीने विचार कराल, तर त्या परिमाणूंचे अनॅलिसिस्-पृथःकरण करून आपण असा खास निकाल सांगाल की व्यापारी पद्धतीच्या लग्नांपासून निर्माण झालेल्या संततीच्या हातून माता किंवा पिता यांच्याबद्दलची कर्तव्ये कधीही पार पडणे शक्य नाही, आणि त्यांच्या हातून मातृप्रेमाची किंवा पितृप्रेमाची अपेक्षा करण्याचा आईला किंवा बापाला मुळी अधिकारच नाही. जेथे खुद्द आईबापांचाच संयोग बळजबरीच्या तत्त्वावर झालेला, जेथे त्यांच्या परस्पर प्रेमाची ग्रंथी व्यापारी धर्तीच्या चढाओढीच्या दोरांनी परस्परांच्या इच्छेविरुद्ध – विशेषतः वधूच्या इच्छेविरुद्ध – बांधलेली असते, आणि जेथे नाइलाजापेक्षा परस्पर प्रेमसंवर्धनाला किंवा प्रेमविनिमयाला दुसरा आधारच नसतो, तेथे त्या तसल्या आईबापांबद्दल – केवळ ते जन्मदाते एवढ्याच मुद्यावर – मुलांनी आपल्या कर्तव्याला कसे व का जागृत रहावे? या कर्तव्याची जाणीव त्यांना उत्पन्नच होण्याची पंचाईत. जेथे आई आणि बाप यांची जोडी रूढीच्या बेजबाबदार जुलमी चुंबकाने एकत्र जुळविलेली असते, तेथे कोणी कितीही
मारून मुटकून वैद्यबुवाचा प्रयोग
केला, तरी त्या दांपत्यात ‘खरा तो प्रेमा’ उत्पन्नच होत नाही; फक्त ‘पदरी पडले आणि पवित्र झाले’ एवढ्याच मुग्ध आणि निष्कपट वृत्तीने पत्नीला आपल्या नियुक्त पतीच्या जोडीने संसार करावा लागतो. अर्थात् जेथे मूळ पायाच विषमतेवर उभारलेला तेथली इमारत तरी समप्रमाणात कोठून उभारली जाणार? विषम विवाहाची प्रजा विषम मनोवृत्तीची निपजली नाही, तर मोठेच आश्चर्य होईल; मित्रहो, स्पष्टोक्तीचा राग मानू नका. आजकाल हिंदुसमाजांत या विषमविवाहाचीच संतती दृष्टीस पडत आहे; आणि यात संततीकडे बोटे दाखून ‘‘अहो राष्ट्राचे भावी स्तंभ हो! अहो उद्याचे राष्ट्रीय पुढारी हो! राष्ट्राच्या भवितव्यतेचे कारागीर हो’’ वगैरे मोठमोठ्या शेलक्या पाल्हाळीक संबोधनांनी वक्ते श्रोत्यांना आळवीत असताना पाहिले म्हणजे त्या वक्त्यांची आणि श्रोत्यांची कीव येते.
प्राचीन आठ विवाहप्रकारांतून सांप्रत ८वा ‘ब्राह्मविवाह’ प्रकार काय तो शिल्लक उरला आहे आणि याच प्रकाराने यच्चावत हिंदूंची लग्ने अलिकडे लागत आहेत लग्नाचे हे आठ प्रकार प्रथम गौतम आणि बौद्धायन यांनी का निर्माण केले, कालवशात् त्यांतील सातांना गचांडी का, काय कारणाने व कोणी दिली आणि सध्याच्या कलियुगात हिंदु म्हणविणा-या लोकांसाठी हा ब्राह्वविवाहच का व काय कारणाने जिवंत राखण्याची काळाची मर्जी झाली, याचे इतिहाससंशोधन कोणी करील तर बरे! तसेच अगदी अलीकडे पृथ्वीराज चव्हाणाच्या इतिहासापर्यंत गांधर्वमिश्रित क्षात्रविवाहाची जी काही उदाहरणे दृष्टीस पडतात ती आता का आणि कोणच्या स्मृतिकाराच्या अनुज्ञेने बंद पडली? मुलीच्या बापाला पैसे देऊन बायको विकत घेण्याची मानुष उर्फ आसुरी विवाहाची जी पद्धत अजूनही कित्येक काठेवाडी-हिंदू-गुजराथी-वाणी लोकांत प्रचलित आहे, ती कोणत्या पुण्याईवर अजून तगली आहे? श्रुतिस्मृतींतील वाक्यांच्या वेलांटी मात्रेच्या बाहेर पाऊल टाकल्यास महापातकांची भीती घालणा-या जीर्णतवाद्यांना आपण असे विचारायला नको काय की विवाहाच्या या निरनिराळ्या सातआठ पद्धती जर नुसत्या त्यांच्या प्राचीनत्वावरून तुम्हाला मान्य आहेत, तर त्यातील काही पद्धती गाळण्याचा हिंदुसमाजाला केव्हाही काय अखत्यार होता? परिस्थिप्रमाणे त्यांतील दैव, आष, पैशाच्च या पद्धती जर तुम्हाला पूर्वी कधी काळी अजिबात निषेधपूर्वक बंद करणे प्राप्त झाले, तर आजला स्वयंवर (गांधर्व) पद्धती नको आणि ब्राह्मविवाह पद्धतीच काय ती पाहिजे किंवा असावी या विचारसरणीस तरी परिस्थितीचा किंवा देशकालवर्तमानाचा असा काय भरभक्कम पुरावा तुमच्यापाशी आहे? आमचे म्हणणे एवढेच आहे की श्रुतिस्मृतींच्या आधारावर आणि धर्मसंकटाच्या धाकदपटशावर जर प्राचीन तत्त्वांना चिकटून राहावयाचे असेल तर खुशाल रहा – घट्ट चिकटून रहा, या विसाव्या शतकातसुद्धा ख्रिस्तीशकापूर्वी हजारबाराशे वर्षांपूर्वीच्या श्रुताज्ञा आणि स्मृत्याज्ञा अक्षरशः आचरणात आणा. परंतु एकदा देशकालवर्तमानाची सबब पुढे आणून तरी एकदा प्राचीनातिशय वेदकालातल्या स्मृतींचा आधारक दाखवून
या बोटवरील थुंकी त्या बोटावर
उडविण्याचा निंद्य प्रयत्न करू नका. देशकालवर्तमानाच्या परिस्थितीप्रमाणे जुन्या स्मृतीतील निवडक आवश्यक तत्त्वांचा पुरस्कार करणे, स्मृतीतील प्राचीन कालच्या वचनात प्रचलित मनुनुरूप अवश्य ते फेरफार करणे किंवा जुन्या आसावर नवीन मानवी जीवनाचे चक्र बसत नसल्यास तो जुना स्मृतिवचनाचा किंवा धर्मशास्त्राचा दांडाच बदलणे, इतके नैतिक धैर्य, मनाचा सरळपणा, औदार्य आणि देशकालवर्मानाप्रमाणे मानवी चरित्राला सहाय्यभूत होण्याइतका तुमच्या सद् बुद्धीचा लवचिकपणा तुमच्यात नसेल किंवा आम्ही आज अशीही पृच्छा करू की तितका उदारपणा तुमच्या त्या जुन्या पुराण्या स्मृत्यादि ग्रंथांत नसेल तर बाबांनो! तुम्ही आणि तुमचे ते श्रुतिस्मृत्यादि ग्रंथ प्रचलित मनूच्या कालौघापासून बरेच दूर रहाल तर बरे!! तुमची जुनी स्मृती लाख गोष्टी सांगत असेल, पण त्यांतली एकही जर आजच्या काळाच्या आकांक्षेला आणि समाजस्थितीला अनुरूप आणि अनुकूल नसेल, तर तुमच्या त्या जरठ ग्रंथांच्या बाडांतील तत्त्वज्ञान काय कोळून प्यायचे आहे? जुने म्हणून सोने एवढ्याच भोळसर कल्पनेच्या भांडवलावर वर्तमान काळाचा व्यापार निभणे शक्य नाही. पूर्व आणि पश्चिम गोलार्धातील सर्व मानवी प्राण्यांच्या निरनिराळ्या ऐहिक संबंधाच्या दो-या ज्या सांप्रतच्या मनुस्मृतीत एकत्र निगडित झालेल्या आहेत, त्यांच्याशी जर प्राचीन स्मृत्यादि ग्रंथांतील आज्ञा प्रतिकूल किंवा आकांक्षाविरोधी असतील, तर त्या केवळ याज्ञवल्क्याच्या किंवा मनुच्या किंवा पराशराच्या आहेत, एवढ्याच सबबीवर त्यांचे ढोलके पिटीत राहणे म्हणजे नवीन मन्वंतरात जिवंत राहण्याइतकी आमच्यात लायकीच उरलेली नाही, अशी स्पष्ट कबुली देणेच होय. मित्रहो! यावरून असा मात्र कोणी आपला समज करून घेऊ नये की प्राचीन स्मृतींबद्दल आम्हाला मुळीच आदर वाटत नाही. आदर आहे, अभिमान आहे, त्या स्मृतिकारांच्या व्यापक आणि विशाल बुद्धिमत्तेबद्दल मोठे सप्रेम कौतुकही वाटते; परंतु त्या स्मृतीतील तत्त्वे अक्षरशः जशीच्या तशीच हिंदुसमाजाने आचंद्रार्क पाळलीच पाहिजेत असा जेव्हा जीर्णमतवाद्यांचा आग्रह ऐकू येतो तेव्हा त्यांच्या संकुचित मनोवृत्तीची कीव करतानाच त्यांच्या दांभिकपणाचा निषेध करणे प्राप्त होते. प्राचीन स्मृत्याज्ञा अक्षरशः पाळण्याबद्दल जर या शालजोडीवाल्यांचा इतका हट्ट उर्फ आग्रह आहे तर प्राचीन चालीरीतीचे पुनरुज्जीवन करण्यास तरी त्यांची समंती आहे का? तीही देण्याइतके मनौदार्य स्मृतिग्रंथांची पारायणे करणा-या या पंडितांच्या आणि त्यांच्या शालजोडीच्या जरीकाठी फल्ल्याचा कोरडा अभिमान बाळगणा-या त्यांच्या बगलबच्च्या वावदुकांच्या स्वप्नीही नाही!
विद्वान वरास सालंकृत कन्या दान करण्याची ब्राह्मविवाह पद्धती ही एकच पद्धती आजला महाराष्ट्रांतील पांढरपेशा हिंदुसमाजात प्रचलित आहे, आणि तीच सरकारदरबारी मानली जाते, म्हणजे सरकारी स्मृतीने हिंदुसमाजाच्या शिफारसीवरूनच तिच्यावर आपल्या मान्यतेचा एकदा शिक्का मारलेला आहे. अर्थात् प्रचलित मन्वंतरातील स्मृतिकाराचा अधिकार परंपरेला अनुसरूनच या देशातील सरकाराकडे गेला आहे. तथापि –
अन्यधर्मी भूपाल आर्यभूचा ।।
आर्यधर्मा अनुकूल नसायाचा ।।
धर्मगुरु ते निःसत्व दंडधारी ।।
वर्णगुरु ते मनसोक्त कर्मचारी ।।
- देवल’’
अशी चमत्कारिक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जुन्या मोडक्यातोडक्या आकुंचित साच्यातल्या साच्यात कुचंबत पडण्याचा घोर प्रसंग हिंदु-विवाहपद्धतीवर आज ओढवला आहे. त्यातून हा ब्राह्मविवाह तरी पद्धतशीर आणि प्राचीन तत्त्वांबरहुकूम पार पडतो का? कालवशात् धर्माच्या पांघरुणाखाली त्यांतही इतक्या अनेक घातकी रूढींचा समावेश होत गेला आहे की सांप्रतची आमची विवाहपद्धती म्हणजे अनेक
सामाजिक जुलमांचे बंड
होऊन राहिली आहे. प्रचलित स्मृतिकार म्हणजे सरकार हे आमच्या कर्मांची जबाबदारी घेण्यास तयार आहे, पण धर्मात हात घालू इच्छित नाही. विवाहविधीची एक ठोकळ कल्पना त्यांच्या दप्तरात नमूद आहे, त्याबरहुकूम भटाने
शुभ मंगल सावधान
म्हटले की विवाह झाल्याचे या अर्वाचीन स्मृतिकारांना मान्य होते. मग त्या विवाहविधीतील निरनिराळ्या पोटविधींत शेकडो पोटव्याधी किंवा मूळव्याधींची जुलमी आणि सामाजिक बंडे उद्भवली असली, तरी ते त्याकडे पहातसुद्धा नाहीत. बरे, या बंडांचे निर्मूलन करण्याकरिता समाजाची याचना करावी, तो स्वतः याचकच बंडखोर आहे असे समाज ठरवितो आणि खुशाल त्या सामाजिक जुलमांच्या लाथा कण्हत कुंथत निलाज-याप्रमाणे खात पडतो.
सामाजिक क्षेत्रांतील जुलमांचा प्रतिकार व प्रतिबंध करण्याकरिता आजपर्यंत जे जे वीर पुढे आले, त्यांचा त्यांचा समाजाने छळ आणि उपहासच केला. त्यांच्यावर नाही नाही ते आरोप केले, त्या जुलमांच्या पुष्टीकरणार्थ स्मृतीची वचने भडाभड बाहेर काढली आणि अशा रीतीने प्रत्येक विशिष्ट सामाजिक सुधारणेच्या वेळी आपल्या प्रतिगामी संकुचित मनोवृत्तींचे प्रदर्शन केले. वधूच्या विवाहकालाची मर्यादा वाढविण्याचा प्रश्न पुढे आला, शालजोडीवाले सरकले पुढे आपले जीर्ण स्मृत्यांचे गळाठे घेऊन, लागले प्रतिपादन करायला की जेहत्ते मनू काय सांगतात, ‘‘दशवर्षा भवेस्कन्या अतऊर्ध्व रजस्वला’’, काय कन्या ऋतुमति झाल्यावर तिचा विवाह? अब्रह्मण्यम्! अहो शास्त्र काय सांगते ते पहा. ‘‘प्राप्ते द्वादशे वर्षे यः कन्यां न प्रयच्छति मासिमासि रजस्तस्याः पिता पिबती शोणितम्’’ असे घाणेरडे महापातक माथ्यावर घेण्यापेक्षा शहाणे असाल, धर्म बुडू नये ( जणूं काय धर्म तरला आहे तो या जीर्णमतवाद्यांच्या शालजोडीच्या पदराच्या आधारावर; नवमतवाद्यांना शालजोडी कोठली? अर्थात् धर्म बुडालाच पाहिजे.) असे तुम्हाला वाटत असेल, तर अकलेच्या खंदकांनो, ‘‘दशवर्षोर्ध्व विवाहो निषिद्धः’’ या मनूच्या वचनाप्रमाणे अक्षरशः वागा. त्यावर नवमतवाद्यांने कितीही कंठशोष करून सांगितले की, अहो महाराज, हाच तुमचा मनु आणखी काय म्हणतो पहा –
त्रीणि वर्षाण्युदीक्षएत कुमार्यृतुमती सती ।
ऊर्ध्वे तु कालादेतस्माद्विंदेत सदृशं पतिम् ।।
[मुलीने ऋतुप्राप्तीनंतर तीन वर्षे वाट पाहून स्वतःस योग्य अशा वराशी लग्न लावावे.] तर ते काही त्यांना रुचत नाही व पचतही नाही; उलट प्रत्येक सामाजिक जुलमाचा प्रतिबंध करणारा त्यांना
धर्माविरुद्ध बंडखोर
असाच दिसू लागतो. असली मंडळी आपल्या निवळ धार्मिक (?) समजुतीसाठी आपल्या मुलीवरील अपत्यप्रेमाला राजीनामा देऊन मुलींची हाडे कशी तरी उजवलीच पाहिजेत म्हणून –
अव्यंगेsपतितेsक्लीबे दशदोपविवर्जिते ।
इमां कन्यां प्रदास्यामि देवाग्निद्विजसन्निधौ ।।
अशी देवता, अग्नि आणि ब्राह्मण यांच्यासमक्ष खोटी प्रतिज्ञा करतात आणि आपली कोवळी ८-९ वर्षांची मुलगी वाटेल त्या दशदोषपूर्ण नवरदेवाच्या गळ्यात बांधतात. असली उदाहरणे शेकड्यांनीच नव्हे तर हजारांनी दाखविता येतील.
विधवांचा पुनर्विवाह प्राचीन शास्त्रांनीही अमान्य केलेला नाही. पण ज्या वेळी ‘पुनर्विवाहाचा कायदा’ अर्वाचीन ब्रिटीश स्मृतिकार मंजूर करू लागले तेव्हाही
धर्म बुडाला! धर्म बुडाला!!
म्हणून या जीर्णमतवाद्यांनी कोलाहल केलाच. नुकताच वसु बिलाचा प्रश्न निघाला होता तेव्हाही हीच आरोळी या लोकांनी ठोकली होती. (सध्याही ‘पटेल बिला’संबंधी बरीवाईट एकही सुधारणा न सुचविता, लोकांचा वृथा गैरसमज करून नाटकी धर्तीच्या वक्तृत्वाने त्यांची मने बिलाविरुद्ध खवळविण्याची कामगिरी बरेच सुशिक्षित व स्वातंत्र्यप्रिय अहंमन्य पंडित करीत आहेत. आज उदारमतवादी तर उद्या नवमतविद्वेषी असली दुटप्पी होण्याची सरडेवजा मंडळी जोपर्यंत आम्ही पुढे पुढे मिरवू देण्याइतके गचाळ आणि हतबल आहोत तोपर्यंत खरोखर ‘देहली बहोत दूर आहे!) ’पुनर्विवाहाचा कायदा पास झाला, परंतु धर्म बुडाल्याची बातमी प्रसिद्ध झाल्याचे अजून ऐकिवात नाही. विशेष वाईट वाटते ते हे की अमूक एक रूढी नको किंवा अमूक एका सामाजिक जुलमाचे उच्चाटन झाले पाहिजे असे स्पष्टोद्गार काढणारी बरीच नवमतवादी मंडळी एगदी ऐन वेळेस त्या रूढीच्या प्रतिबंधकास विरोध करण्याकरिता जीर्णमतवाद्यांच्या सुराशी आलाही सूर मिळवून घेतात. यावरून इतकेच सिद्ध होते की स्वतंत्र विचार करण्याची आमच्या लोकांत अजून पात्रता आलेली नाही. स्वतःच्या ठाम मतांना प्रामाणिकपणाने चिकटून राहण्याची अंगी धमक नाही, आणि सारासार विचार करून ठरविलेल्या किंवा प्रत्यक्ष अनुभवाने पटलेल्या सिद्धांतांना नाटकी प्रवचनकारांच्या स्वार्थी व खोडसाळ विधानांच्या प्लेगापासून अलिप्त ठएवण्याचे नैतिक धैर्यही नाही. वक्त्याच्या अनुकूळ किंवा प्रतिकूल वाटेल त्या मताला एकाच वेळी एकसारख्या टाळ्या देण्याला यदृच्छेने म्हणा, कळत म्हणा किंवा नकळत म्हणा आम्ही जोपर्यंत आमचे हात उचलण्यात तयार आहोत तोपर्यंत नुसत्या वक्तृत्वाच्या किंवा लेखनशैलीच्या भरारीने आमच्यावर वाटेल त्या विवक्षित मताभिलाषाचा आरोप करण्याची संधी आपमतलबी आणि स्वार्थसाधु वक्ते व लेखक यांनी वाया का घालवावी? नव्या मन्वंतरातील नवमतवाद्यांच्या मनाची ही दुर्बलता पाहिली की, जीर्मतवादी कितीही हट्टवादी असले तरी त्यांच्या स्वमताभिमानाबद्दल आणि निश्चित तत्त्वपुरस्काराबद्दल त्यांच्या पायांवर आदरपूर्वक मस्तकच ठेवणे योग्य होईल.
जुन्या स्मृतीतील वचनांचा जर कोणी अभ्यास करील तर त्यांतही स्मृतिकारांच्या व्यापक दूरदर्शित्वाची साक्ष पटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे नवमतवाद्यांनाही त्यातील आज्ञांच्या आधारांवरून अपेक्षित सामाजिक सुधारणा घडवून आणण्याइतका अवकाश त्यात खास सापडेल. जीर्णमतवादी व नवमतवादी यांच्यात वास्तविक मतभेद का असावा हेच कळत नाही. जीर्णमतवाद्यांच्या संकुचित मताभिलाषाला जितके पाठबळ त्यात दिलेले आहे तितकचा व्यक्तिस्वातंत्र्याला व नवमत-पुरस्काराला त्याच स्मृतींतून पूर्ण मुभा ठेवलेली आहे. ब्राह्मविवाहाची पद्धत आज हिंदुसमाजात प्रचलित असली तर ती या पुढे आचंद्रार्क आहे तशीच राहिली पाहिजे इतका हट्ट धरण्याइतक्या आमच्या प्राचीन मन्वादिकांच्या स्मृत्या खास संकुचित वृत्तीने लिहिलेल्या नाहीत. देशकालवर्तमानाप्रमाणे ब्राह्मविवाहाचे चक्र प्रचलित मन्वंतराच्या आसावर जर निमूटपणे बिनतक्रार चालत नसेल तर ते चाक फेकून देऊन त्याच्याऐवजी जुन्याच स्मृतींच्या स्टोअर्समधून गांधर्व (स्वयंवर) किंवा क्षात्रविवाहाचे चक्र आणून बसविण्याचा हिंदुसमाजाने उपक्रम केल्यास प्राचीन स्मृतिका त्यास वाटेल तितके पाठबळच देतील. चालू मन्वंतरांत इष्ट असलेली कोणतीही सामाजिक सुधारणा घडवून आणण्याच्या कामी प्राचीन स्मृतीच्या क्षेत्राबाहेर आम्हाला पाऊल टाकावेच लागेल असे नाही. रूढींचे दास्यत्व एकीकडे मान्य करून दुसरीकडे स्मृतींतील एकांगी वचनाचा अक्षरशः कीस काढणा-या मंडळीनी आपले फाजील दुराग्रह आणि संकुचित कल्पना झुगारून देण्याइतकी मनाची समता मात्र दाखविली पाहिजे की इष्ट कार्यभाग धर्म न बुडता किंवा
धर्माच्या मानेला फास
न बसता अत्यंत सलोख्याने उरकता येणे शक्य आहे. जे रीतीरिवाज (रूढी म्हणा वाटेल तर) पूर्वी एका काळी आमच्या समाजात अस्तित्वात होते. त्यांचेच पुनरुज्जीवन व्हावे अशी जर नवमतवाद्यांची अपेक्षा असले, तर त्यात वावगे ते काय? आणि त्याला प्रतिकार करणे तरी न्यायाचे कसे ठरते? जुनी रूढी पुन्हा चालू करणे शक्य नाही असे नाही; परंतु त्या गोष्टीस दिवसगत फार लागते. म्हणून नवीन लोकमताची आकांक्षा करीत व सुलभ रीतीने पूर्ण करण्याकरिता सरकारी कायद्याचे शिक्कामोर्तब त्यावर पडले म्हणजे तेच रूढी पाडण्याचे कार्य सुलभ होते.
पूर्वीच्या लोकानी हाच क्रम स्वीकारल्याचे इतिहासात नमूद आहे. आता, सांप्रत आमचे सरकार विधर्मी असल्यामुळे सामाजिक जुलमांच्या निराकरणाचा प्रश्न त्यांच्याकडे द्यायला आमची सोवळी मंडळी बाचकतात. परंतु परिस्थितीच जर अशी आली आहे, आणि राजमुद्रेच्या प्रतिज्ञेशिवाय लोकमताला जुन्या रूढीचे नवीन कालासाठी पुरुज्जीवन करण्याचे अंगी धैर्यच नाही, तर बाजूला सारून समाजहितासाठी विधर्मी सरकारची पायरी चढायला नको का?
सोवळ्या विनयाचा बुरखा
हिंदुसमाजात सध्या रूढ असलेली विवाह-पद्धत प्राचीन अष्टविवाहांपैकी एक आहे, एवढ्याच कारणाने ती आचंद्रार्क जशीच्या तशीच कायम रहावी असा वाद घालणा-या प्राण्यांची आण नुसती कीव करून पुढे जावे हे बरे. आजएवढे सर्वमतवादी कबूलच करतात ना की सांप्रतची विवाहपद्धती अनेक सामाजिक जुलमांनी सडून गेली आहे म्हणून? त्यातील त्या जुलमी रूढींचा नायनाट करून ती शुद्ध आणि सात्विक करण्याचा यत्न तरी केला पाहिजे एक, किंवा हे शक्य नसल्यास ती सबंध पद्धतच्या पद्धत साफ झुगारून देऊन नवीन पद्धतच सुरू केली पाहिजे एक. यांपैकी काहीतरी एक मार्ग अवश्यमेव शोधून काढण्याचा प्रसंग आज हिंदुसमाजावर येऊन धडकला आहे.या प्रसंगाची योग्य ती वासलाद लागेपर्यंत उन्नतीच्या मार्गात त्यांचे पाऊल पुढे पडणे बरचे दुरापास्त आहे. जोपर्यंत सामाजिक जुलमांचा निर्मूलन होणार नाही तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्य मिळाले तरी ते मुळीच टिकणार नाही. राजकीय क्षेत्रांतील जुलमांचा निषेध किंवा प्रतिकार करण्याच्या कामी कास ठोकून दंड थोपटून सज्ज झालेल्या वीरांनी आपण सामाजिक क्षेत्रांत किती जुलमी अरेरावी गाजवीत असतो याचा क्षणभर विचार करणे अवश्य आहे.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता*
हा मंत्र आजकाल सगळेच पाठ म्हणतात. (स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दल प्रश्न निघाला असता बर्फासारखे थंडगार पडणारे किंवा चहासारखे उकळणारे कित्येक सज्जन या वाक्याचा अर्थ मोठ्या कौतुकाने ‘‘बायकांना डोक्यावर घेऊन नाचले म्हणजे देवता प्रसन्न होतात.’’ असा करतात.) स्त्रियांच्या समसमान नैसर्गिक हक्कांबद्दल जाणीव उत्पन्न झालेल्या ब-याच सुशिक्षित लोकांनी तर हे वाक्य आपले ब्रीदवाक्यच (मॉटो) केले आहे. परंतु मित्रहो! फार खेदाची गोष्ट आहे, हेच सुशिक्षित लोक या लग्नसराईत स्वतःच्या किंवा मित्रांच्या वधूरीक्षणप्रसंगी
अनेक कुमारिकांच्या इज्जति
घ्यायला मागेपुढे पहात नाहीत! ‘मुलगी पहाणे’ हा एक आमच्या विवाह-पद्धतीतील पहिला ठळक सामाजिक जुलूम होय. वधुपरीक्षण कोणी केव्हाही अमान्य केलेले नाही किंवा त्याच्या अनावश्यकतेबद्दल कोणी केव्हाही प्रश्न विचारलेला नाही. जन्माची सोबतीण वाटेल त्याने नीट पारखून घ्यावी. त्याला कोणीही हरकत घेत नसतो. परंतु ही वधुपरीक्षणाची अलीकडची रीत पाहिली म्हणजे मात्र संताप आल्याशिवाय राहात नाही. पुरुषाच्या संसाराला स्त्रीचे महत्त्व किती आहे, हे वाटेल त्या संस्कृत, प्राकृत किंवा इंग्रजी तत्त्ववेत्त्यांच्या ग्रंथाधारे सिद्ध होण्यासारखे आहे. ‘‘धर्मप्रजासिध्यर्थ प्रतिगृण्हामि’’ अशीच आपल्या वधूजवळ वराची प्रतिज्ञा असते. ‘‘धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामि’ अशी सर्व विश्वदेवतांच्या समक्ष वरवधूजवळ त्रिवार शपथ घेतो. आमच्या विवाहविधीतील शपथांचे प्रमाण काढले तर वराच्या दहा शपथांशी वधूच्या एक शपथेचे प्रमाण पडते. यांवरून मानवी समाजातील या जीवनक्रांतिकारक विधीत वधूचे महत्त्व केवढे आहे हे समजून येईल. या साऱ्या गोष्टी कितीही ख-या असल्यातरी प्रत्येक लग्नसराईत सुशिक्षित म्हणविणारांच्यात हातून वधुपरीक्षणाचे जे फार्स करण्यात येतात, त्यांतील वधूंच्या विनयाची व शालीनतेची होणारी पायमल्ली पाहिली म्हणजे आमच्या समाजाची धार्मिक वृत्तीच नष्ट झाली असे म्हणणे प्राप्त होते.
स्त्रियांच्या नाजूक मनोवृत्तीबद्दल वारंवार कैवार घेणारे आधुनिक वीर महावीर या ‘मुलगी पहाण्याच्या’ कामात इतके बेशरम आणि फाजील बनतात की त्यांच्या वर्तनाची कोणत्याही समंजस मनुष्यास शिसारीच आली पाहिजे. वरशोधन आणि वधूशोधन हे प्रकार पूर्वी होते; नाही असे नाही. सध्याही ते अस्तित्वात नाहीत असेही नाही. जुन्या काळचे काही आचार व विचार नव्या काळात जरी अगदी नामशेष झाल्यासारखे दिसतात, तरी त्यांतील काहींची विपरीत, काहींची विस्तृत आणि काहींची संकुचित स्वरूपे सांप्रत आढळून आल्यावाचून राहत नाहीत.
लग्नविधीचा इतिहास पाहिला तर स्वसंतोषाने स्त्रियांस आजन्म कौमार्यात राहता येण्याची आणि स्वयंवराची जुन्या काळची जवळजवळ नामशेष झालेली चाल आता काही तुरळक तुरळक उदाहरणांनी पुनरुज्जीवित होत असल्याचे भासते, परंतु वास्तविकरीत्या ती नष्टच झाली असे समजण्यास हरकत नाही. वराकडून वधूला मागणी घालण्याची चाल नष्ट होऊन तिच्या ऐवजी तिच्या अगदी विरुद्ध अशी मुलीच्या बापाने अगर पालकाने वराकरिता गावोगाव हिंडून जोडे फाडण्याची चाल प्रचारात आली आहे. आर्यमहिलावर्गाला देवीसमान पूज्य असलेल्या पुराणप्रसिद्ध सावित्रीचेच उदाहरण घ्या. तिच्या सद्गुणसंपन्नतेचा आणि सौंदर्याचा महिमा इतका लोकोत्तर होता की मोठमोठ्या कुलीन आणि सर्वगुणसंपन्न राजपुत्रांनाही तिच्याबद्दल मागणी करण्याचे धाडस करवेना. बरे, तत्कालीन प्रचाराप्रमाणे वराकडून मागणी आल्याशिवाय तिच्या पित्याला तिच्या विवाहाची काहीच तजवीज करता येईना आणि मुलगी तर वाढत चालली. तेव्हा स्वयंवर पद्धतीचा अवलंब करून त्याने सावित्रीला स्वतःच वरशोधन करण्याची अनुज्ञा दिली. सध्या वरशोधन मात्र अत्यंत भ्रष्ट स्थितीत अस्तित्वात आहे आणि वधुशोधनाच्या ऐवजी वधुपरीक्षेचा एक भ्रष्ट आणि असभ्य प्रकार चालू झाला आहे. वरशोधन वधूच्या पित्याने करावयाचे. याचा स्पष्टार्थ इतकाच की ‘लग्न करावयास – मग ते दुसरे, तिसरे किंवा चवथे असले तरी हरकत नाही – तयार असलेल्या पुरुषाचा शोध करावयाचा! मुलीचे लग्न यंदा केलेच पाहिजे, नाहीतर जगात तोंड वर काढायला जागा राहणार नाही, असल्या भ्रामक आणि धर्माच्या किंवा व्यवहाराच्या संकुचित कल्पनेने त्रस्त झालेल्या बापाला शोधून काढलेल्या वराच्या पुरुषपणाखेरीज इतर कसल्याही गोष्टींची चवकशी करण्यास अवकाश नसतो; निदान तो तितक्या खोल पाण्यात शिरूच इच्छित नाही म्हणा, अगर त्याला या गोष्टींची आवश्यकता भासत नाही म्हणा; कीह तरी एक गोष्ट निर्विवाद आहे. ही असली शोचनीय परिस्थिती अलीकडील शेकडा ९५ लग्नांत आढळून येते. वरशोधनाची परीक्षण-दृष्टी आताच्याही पुढे एखादे पाऊल गेलीच तर वराच्या विद्याभ्यासाबद्दल किंचित् उडतउडत चौकशी करून तो नोकरदार असल्याचे खात्रीलायक पटले की
कसेतरी मुलीचे पोट भरील
एवढ्या भरवशावर तो गरजवंत म्हणून अक्कल नसलेल्या मुलीचा बाप विवाहेच्छू पुरुषाला वधूपरीक्षा करण्यासाठी आपल्या घरी येण्याची विनंती करतो. टिपण जुळवणे, वराच्या घराण्याच्या अनुवंशिक काही विशिष्ट माहितीचा शोध करणे, खुद्द वराच्या बौद्धिक व नैतिक संस्कृतीची अजमावणी करणे वगैरे गोष्टी पूर्वी जरी शुद्ध हेतूतूनच निर्माण झालेल्या दिसतात, तरी प्रत्यक्ष व्यवहारात त्या भ्रष्ट स्वरूपातच वावरत होत्या व आता तर त्या बहुतक फार्साप्रमाणेच पाळण्यात येतात, म्हणजे जवळजवळ त्या नष्टच होऊ लागल्या आहेत असे मानण्यास पुष्कळ आधार आहेत. मुलगा लग्नास तयार आहे, घरातील वडील मंडळीचा त्याच्या हेतूला ‘टेकू’ आहे आणि लग्न यंदाच ‘कर्तव्य’ आहे. एवढ्या सामुग्रीचा तीन पिळाचा धागा हाती येताच उपवर मुलींचे गरजू बाप त्या धाग्याच्या आधारावर वरप्राप्तीचा किल्ला सर करण्यास तेव्हाच कंबर बांधतात अर्थात् वरशोधन याचा अर्थच आता ‘वराचा शोध लावणे’ इतका अक्षरशः होऊन बसला आहे. पण ज्या मुलीची त्याच्याशी जन्मगाठ ठोकून द्यावयाची असते, तिला तो वर पसंत पडेल की नाही; त्याचे गुणावगुण तिच्या गुणावगुणांशी किंवा रुचीअरुचीशी कोणत्याही प्रकारचा जाचक भेद उत्पन्न होऊ न देता समतोल प्रमाणात राहतील किंवा नाही; किंवा या दोघांचा संयोग खुद्द त्या दोघांना तरी सर्व दृष्टींनी सुखकारक होईल की नाही, या गोष्टींचा कोणीही तिळमात्र विचार करीत नाही. मुलीचे लग्न म्हणजे घरात वाढलेली धोंड एदा दुस-याच्या गळ्यात कशीबशी बांधून लौकिकी दृष्ट्या आपण स्वतः मात्र कर्तव्यमुक्त म्हणून नाक वर काढून जगात मिरवायला तयार होणे. येथे पित्याचे कर्तव्य बहुतेक खलास होते. वधुपरीक्षेच्या लॉटरीतून पसंतीचा शिक्का मिळाला आणि वराच्या किंमतीबद्दल
देण्याघेण्याचा सौदा पटला
म्हणजे विवाहाच्या श्रीगणेशाची मेलगाडी लाईन क्लीअर मिळून चालू लागते. सांप्रतची शोधनपद्धती इतकी जुलमी आणि असभ्य बनलेली आहे की वराने मात्र वधूला चारचौघांच्या बैठकीत आणून तिची तोंडी लेखी वाटेल तशी कस्सून परीक्षा घ्यावी आणि वधूने मात्र वराच्या गुणावगुणांद्दल चकार शब्दही न काढता निमूटपणे बिनतक्रार त्याच्या गळ्यात माळ घालावी. मग तो अक्षरशून्य टोणपा असो, व्यसनी कुरूप असो किंवा वयातीत असो, तोच पति तिने मान्य केला पाहिजे.
जास्त बोलण्याचा तिला अधिकारच नाही. स्वयंनिर्णयाचा डंका पिटणा-या या विसाव्या शतकांत कुमारिकांचा वरपसंतीचा नैसर्गिक हक्कसुद्धा न जुमानण्याइतके जुलमी लोक स्वराज्याची अपेक्षा करतात, इतर राष्ट्रांच्या खुर्चीला खुर्ची भिडवून समसमान हक्काचा वारसा मोठ्या आवेशाने प्रतिपादन करतात, हे आश्चर्य नव्हे काय? वरपसंती कोण करणार? तर मुलीचा बाप आणि त्याचे नातलग व मित्र. सृष्टीनियमाप्रमाणे वृद्धिंगत होणारे आपल्या मुलीचे सौंदर्यमिश्रित तारुण्य पाहून आनंद मानण्याऐवजी संकटाची हैबत खाणारा आणि मुलीने माळ घालताच ‘सुटलो’ म्हणून तिच्या विषयीच्या सर्व जबाबदारीतून अक्षरशः सुटणा-या बापाने वरपसंती करावी आणि मुलीने गुपचुप त्या पसंतीला मुग्ध संमती द्यावी, हा प्रकार पूर्वीच्या अंधा-या रानटी युगात प्रचारात असला तर खुशाल असो, परंतु सध्याच्या स्वातंत्र्ययुगात तोच प्रचारात अस्तित्वात असावा ही गोष्ट आमच्या
संस्कृतीवर डांबर
ओतणारी नाही, असे म्हणणारा इसमसुद्धा सध्याच्या मन्वंतरात फार दिवस जिवंत न राहील तितके बरे! भावी संसारसुखाची अत्यंत मनोरम आणि हृदयविकासी चित्रे लहानपणापासून आपल्या हृदयफलकावर कोरून ठेवण्यात जिची सारी कौमार्यावस्था खर्च झालेली असते, तिने ऐन उमेदीच्या घटकेला मनोराज्यांतर्गत त्या सर्व उत्कृष्ट कल्पनाचित्रांना साफ पुसून टाकून केवळ आपल्या बापाच्या किंवा पालकाच्या वरपसंतीच्या निर्णयाला बिनतक्रार आपली मान द्यावी आणि तो
गळ्यांत दावे बांधून
देईल त्याच्या मागोमाग एक ब्रहि न काढता निघून जावे, ही पद्धत वैवाहिक संकाराच्या दृष्टीने अघोर आणि राक्षसी तर ठरेलच ठरेल, पण प्राचीन भारतीय संस्कृतीच्या लंब्याचौड्या गप्पा मारणारांच्या आणि स्वातंत्र्याचे पोवाडे गाणारांच्या तोंडाला काळीमा लावणारी मात्र खास आहे. स्त्रियांच्या विद्वत्तेचा शौर्याचा व पावित्र्याचा प्रश्न निघताच जुनी पुराणांची बाडे हुडकून गार्गी, मैत्रेयी, कुंती इत्यादी स्त्रियांची उदाहरणे प्रतिपक्षियांच्या तोंडावर भडाभड फेकणारे आमचे शालजोडीवाले आणि पाटलूणवालेसुद्धा स्वतःच्या कन्याकुमारिकांच्या वराभिरुचीचा खून करून कालवडीप्रमाणे त्यांना वाटेल त्या बैलोबाच्या गळ्यात जखडून बांधण्यात मागेपुढे पहात नाहीत, ही अत्यंत शरमेची गोष्ट नव्हे काय? या बळजबरीच्या पद्धतीने सारा हिंदूसमाज आजला विषमविवाहाचा पुरस्कर्ता बनवून सोडला आहे. वर्णव्यवस्थेच्या कुचक्या विरळ पडद्याखाली विषम विवाहापासून निर्माण झालेली शूद्र वृत्तीची प्रजा बोकाळू लागली आहे. असंख्य अबला कुमारिकांच्या मनोरथांचे टोलेजंग किल्ले आम्ही आमच्या क्षुल्लक स्वार्थी इच्छेच्या बांबगोळ्यांनी धडाधड कोसळवून धुळीस मिळविले आहेत. आमच्या या जुलूमी वरपसंतीच्या रूढीने त्यांच्या सोन्यासारख्या महत्त्वाकांक्षांची, त्यांच्या उदयोन्मुख चारित्र्याची, फार काय त्यांच्या सर्वस्वाची आम्ही राखरांगोळी करून टाकली आहे, याबद्दल त्या असंख्य कुमारिका आम्हाला कितीतरी
तळतळून शाप देत असतील
याचा जोपर्यंत आम्ही विचार करीत नाही तोपर्यंत आम्हाला ऐहिक सौख्य तर नाहीच नाही, पण पारलौकिक सुखाचीही आशा बाळगण्याचा आम्हाला अधिकार नाही,.सरळ विधाने वाकड्या दृष्टीने पाहून ती वाकड्याच रीतीने प्रतिपादन करणारी मंडळी, आपल्या भाडोत्री विचारसणीच्या पुष्टीसाठी नेहमी तात्पुरती धर्माची कांस धरून धर्माभिमान्याचा मोठा आव आणतात. जणु काय धर्माचे खरे रहस्य काय ते त्यांनाच नाहीत, धर्माचा खरा अभिमान काय तो त्यांनाच आणि धर्म म्हणून जर काही राहिला असेल तर तो केवळ त्यांच्यामुळे. असली मंडळी एकदा विवेचनाच्या भरात आली म्हणजे
वडाची साल पिंपळाला
लावून धर्मपांडित्याच्या नावाखाली नेहमी बहुजनसमाजाचा गैरसमज करण्याचा स्तुत्य उपद्व्याप करीत असतात.प्रत्येक नव्या सुधारणेच्या हंगामातच मात्र ही धर्माभिमान्यांची मंडुकसेना उत्पन्न होत असते, हे विशेष लक्षात ठेवण्यासारखे आहे. एरवी यांचा वाससुद्धा कोठे येत नाही. विशेष वाईट वाटते ते हेच की नावासठी आणि वर्तमानपत्री कीर्तीसाठी हपापलेल्या कित्येक सुशिक्षित तरुण सभेतील चाळ्यांच्या प्रसादानी आपली पोटे टेचून भरण्याच्या कोत्या अहमहमिकेने विपर्यासी मंडुकसेनेच्या डरांवडरांव पांडित्यांत आपणही नकळत सामील होतात आणि अमुक एका सुधारणेला विरोध करणे ही गोष्ट आपल्या सद् सद्विवेकबुद्धीला मान्य नाही, ती एकसारखी आतून टोचीत आहे, हे कळत असूनसुद्धा नुसत्या तात्पुरत्या कागदी लौकिकासाठी ते त्या मंडुकांच्या विपर्यासपूर्ण डबक्यात यथेच्छ विहार करण्यास मागेपुढे पहात नाहीत.
या विद्वानांच्या पुढे कुमारिकांच्या वरपसंतीच्या नैसर्गिक हक्काचा प्रश्न मांडा की पहा काय त्यांचे तारे तुटतात ते. मुलीच्या आवडीनिवडीच्या प्रश्नाला काय महत्त्व द्यायचे? वरपसंतीसाठी बाप जसा घरोघर आणि गावोगाव जोडे फाडीत असतो, तसे काय मुलीनींच स्वतः भटकायचे? मुलींना जर वरपसंतीची परवानगी दिली तर त्या बेफाम होतील. (जणु काय त्या बिचा-या पंडितांना बेफाम होणे कशाशी खातात हे माहीतही नसते!)
त्यांच्या शालीनतेचा भंग होईल. (त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी झाली तरी चालेल!) या असल्या सुधारणेच्या झंजावाताने त्यांच्या विनयावरचा बुरखा पार उडून जाईल. (पूर्वीची सावित्री आणि अगदी अलीकडची पृथ्वीराजाची संयोगिता या उनाड पोरीच म्हणायच्या!) आणि त्यांच्या उर्मटपणाने आमच्या घराण्याच्या नावलौकिकाला काळे लागायचे. (एरवी हे आपल्या घराण्याच्या नावलौकिकावर दररोज सफेदीचा डबलहात देत असतात.) अहो, असली भलतीसलती सुधारणा केली तर
हिंदुधर्म ठार बुडणार!
सर्व विधानांचे पर्यवसान एकदा धर्मावर आणून भिडविले की झाले! असले कूपमंडुकी विचार जोपर्यंत आमच्यातील चांगल्या शिकल्यासवरलेल्या एज्युकेटेड लोकांतही अजून पाहण्यात येत आहेत, तोपर्यंत ऐहिक सौख्यांची कसलीही अपेक्षा आम्ही केली तरी शेवटी पदरात धूळच पडणार आहे. जे सुशिक्षित लोक एरवी मोठमोठ्या तत्त्वज्ञानाच्या आणि मतस्वातंत्र्याच्या गप्पा मारतात आणि लेक्चरेही झोडतात, तेच लोक लग्नसराई आली रे आली की मोठ्या धर्मभोळ्याचा आव आणून पापपुण्याचा कीस काढण्यास तयार होतात, हे नवल नव्हे काय? वरपसंतीकरिता वधूने घराबाहेर पडलेच पाहिजे असे काही शास्त्र नाही. बापाने वर शोधन केल्यावर तो जसा घरातील इतर मंडळींचा त्या वराबद्दल औपचारिक सल्ला विचारतो, त्याचप्रमाणे औपचारिकत्वाचा पडदा बाजूला सारून किंचित् निराळ्या पद्धतीने त्याने आपल्या कन्येच्या पसंतीचा अंदाज काढून त्याप्रमाणे पुढील कार्यक्रम ठरविला तर त्यात धर्म तो कसा बुडणार? परंतु त्याला भीती ही असते की आता कुठे जोडेफाड करून हे स्थळ शोधून काढले; आता याला ही नाही म्हणाली तर पुनः ही जोडेफाडीची ब्याद माझ्या मागे लागणार ना! केवळ एवढ्याच कारणासाठी मुलींच्या समंतीला धाब्यावर बसविण्याचा बापाचा हक्क शाबीत होतो, याशिवाय या गोष्टीचे इतिहाससंशोधन किंवा व्युत्पत्ती आणखी तिस-या त-हेने लागणे शक्य नाही. असो. यावरून एवढी एक गोष्ट सिद्ध होत आहे की आमच्यात मनाची उदारता शिल्लक नाही! आता आपण
वधूपरीक्षेचा फार्स
अलीकडे कसा काय करण्यात येतो इकडे वळू. वरशोधनासाठी जेवढी खटपट करावी लागते आणि जे ताप सहन करावे लागतात, त्या सा-यांची बरी वाईट बोळवण या वधुपरीक्षेत एका चुटकीसरशी होत असते. बिचा-या विद्यार्थ्याने मरमर मरून वर्षभर अभ्यास करावा, प्रकृती बिघडून घ्यावी, डॉक्टरांचे ऋणको बनावे, परीक्षेला बसावे आणि परीक्षकाने मात्र त्याचे पेपर एकदा उलटेसुलटे करून ‘फेsल्’ असा हेल काढला की, बिचा-याची सारी खटपट फुकट गेली! वधुपरीक्षेचा फार्स अगदी असाच होतो. मुलीला पाह्यला सामान्यतः नवरी मुलगा, त्याचे कोणी नातेवाईक, (हे नुसते उपचारालाच बरोबर येतात; परंतु खरे मार्मिक वधुपरीक्षा करणारे म्हटले म्हणजे) त्याचे समवयस्क दोनचार एज्युकेटेड मित्र, नावाला बरोबर एखादी तरुण सवाशीण किंवा म्हातारी आजीबाई एवढी मंडळी येतात. ही पाहुणी मंडळी येणार म्हणून मुलीचा बाप इकडून तिकडून चारपाच जाजमे गालिचे आणतो, काही लोड तक्के मिळाले तर पाहतो, नाहीतर आतली चादर बाहेर लपेटून निजायच्या गादीला टेकायचा लोड बनवितो. पानसुपारीची व मिष्टमिष्ट फराळांची घरात व्यवस्था ठेवतो आणि चांगला जामानिमा करून पाहुण्यांची मार्गप्रतीक्षा करीत चिंतातूर मुद्रेने दरावाजात जा ये करीत असतो. आपली मुलगी
पाहुण्यांच्या डोळ्यात भरावी
म्हणून तो बायकोकडून चांगली नटवून थटवून आणि शिकवून ठेवतो. मुलीची आई फराळाचे जिन्नस करण्यात आणि मसाल्याचे दूध आळविण्यात जरी गुंतली असली, तरी तिचे लक्ष पुढल्या दरवाज्याकडे लागून राहते. जरा कोठे काही आवाज झाला तरी ‘‘आले’’ असा तिला भास होऊन क्षणोक्षणी ती कावरीबावरी होतच असते.
नव-याने बिनपगारी रजा घेऊन गावोगाव जोडे फाडून आजचा हा सुयोग जुळवून आणला असल्यामुळे ‘‘पुढे काय होते आणि काय ठरते’’ या निकालाकडे आणि मुलीच्या परीक्षेच्या दिव्याकडे तिचे चिंतामग्न लक्ष अगदी वेधून राहणे केव्हाही साहजिकच आहे. प्रत्यक्ष लग्नापेक्षा ही परीक्षेची घोरपड मोठी बिकट.
मला पाह्यला येणारे कोण कोण आहेत, कसे असतील, काय विचारतील, त्यांची पसंतीची व्याख्या काय आणि कशावर अवलंबून असेल, आईने पुष्कळ शिकवून ठेवले पण तेच प्रश्न ते विचारतील का दुसरे? त्यांनी नापसंत म्हटले म्हणजे बाबांना काय वाटेल, आईला काय वाटेल, इत्यादि नानाप्रकारच्या प्रश्नांचे आणि संशयाचे मुलीच्या हृदयात काहूर उसळल्यामुळे बाह्यात्कारी जरी तिला शेजाऱ्यांकडून उसनवार आणलेल्या वस्त्रांनी आणि दागिन्यांनी नटविलेली असते, तरी तिच्या हृदयाची खळबळ तिचा मेंदू म्लान केल्याशिवाय खचित राहत नाही. पाहुण्यांच्या मानमरातबात व आदरातिथ्यात काही उणे पडू नये म्हणून बार त्या दिवशी खर्चाकडे अगदी सढळ हात ठेवतो. ‘ताईला पहायला येणार आहेत’ म्हणून मुलीची धाकटी भावंडे भाबडेपणाने सा-या चाळीत आणि आळीत जाहिरात देत असतात. इतकी सगळी कडेकोट तयारी करावी; इतक्यात वरपक्षाकडील कोणतरी दादा येतात आणि सांगतात की ऐनवेळेस मुलाची मावशी – जी मुलीला पाहायला येणार होती ती काही अडचणींमुळे आज येऊ शकत नाही म्हणून तुम्ही काही वाट पाहू नका. झाले, बिचा-यांनी एवढी धावपळ करून इतका खटाटोप केला पण दादांच्या एका शब्दाच्या निरोपाने त्यावर पाणी ओतले, फराळाची सारी तयारी फुकटे गेली, घरात सर्वत्र नाउमेद झाली, आणि ‘वाट पाहू नका’ याचा अर्थ काय हे स्वतः पाहण्यासाठी बिचारा बाप धापा टाकीत वराच्या बि-हाडाचा रस्ता धरतो. अशी आशेची निराळा करणा-या हकिकती नेहमीच घडत असतात असे नाही. परंतु मुलीच्या लग्नाचा ग्रहदशेचा फेरा आला म्हणजे असले क्षुल्लक दिसणारे प्रसंगसुद्धा वेळी गरिबांच्या काळजाचे कसे पाणी पाणी करतात याचा मासला म्हणून येथे सांगितला. पुढे, दिवस ठरला म्हणजे
येरे माझ्या मागल्या
प्रमाणे सर्व तयारी कडेलोट करावीच लागते. मंडळी येऊन बसतात. नंतर त्यातले कोणी धीट म्हणविणारे शिष्ट ‘मुलीला आणा’ म्हणून स्पष्ट सूचना देतात. मुलगी येते व खाली मान घालून उभी राहते. शिकली सवरली तरी हिंदूंचीच मुलगी! नाहीतर काय तिने बैठकीत आल्याबरोबर सर्वांकडे टकटका पहात सुटावे? तसे पाहिले तर उद्धट मुलगी आणि खाली पाहिले तर लाजाळू मुलगी! मृदंगाला दोन्हीकडून थापा!! नंतर प्रथम मुलीला नाव विचारण्याची कोणी तरी धीट शिष्ट सुरुवात करतो आणि सरतेशेवटी, वाचून घेणे, शुद्धलेखन घालणे, गायला येते का म्हणून विचारणे, होय उत्तर आल्यास गाऊन घेणे, काही पावले मागेपुढे चालावयास सांगणे, येथपर्यंत मजल गेल्याचे दाखले हवे तितके मिळतील. अजूनपर्यंत मुली तुला तालसुरावर नाचता येते काय असा कोणी प्रश्न विचारून तिला नाचायला लावायचे आमच्या ऐकिवात नाही, हे एक कुमारिकांवर मोठे उपकार आहेत. नाही म्हणायला, मुलीची चालरीत कशी काय आहे व गृहकृत्यासंबंधी तिचे ज्ञान किती आहे हे प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा दर्शवून एका
गरजवंत ऊर्फ बेअक्कल बापाची मुलगी
एका प्रतिष्ठित म्हणविणा-या बड्या गृहस्थाने सबंध एक दिवस आणि एक रात्र आपल्या घरी ठेवून घेतली. तिच्याजवळून झाडलोट, खरकटी, पोतेरे वगैरे कामे मोलकरणीप्रमाणे करून घेऊन दुस-या दिवशी तिच्याच हाती ‘यंदा लग्न कर्तव्य नाही’ असं तिच्या बापाला पत्र लिहून तिची रवानगी केल्याचे हलकट उदाहरण मी स्वतः पाहिले आहे. असो. वरील प्रमाणे वधुपरीक्षा झाल्यावर प्रतिष्टित पाहुणी मंडळी फराळावर यथेच्छ ताव मारून घरी चालते होतात. मुलीच्या तरतरीत नासिकेप्रमाणे तिचे दैव जर तितकेच तरतरीत आणि सरळ असेल, तर ती एकाच परिक्षेच्या दिव्यातून सुटते आणि तेच जर बसके दैव असेल, तर त्या बिचारीला ‘पाह्यला येणार’च्या परीक्षांवर परीक्षा देतादेता नको जन्म होऊन जाते. कित्येक सुशिक्षित वल्ली तर असे आढळतात की ते आपल्या इष्टमित्रांच्या लटांबरासह एकाच दिवशी निरनिराळ्या वेळी तीनचार ठिकाणच्या तीन चार मुली पाहण्याचा धंदाच करता, आणि प्रत्येक ठिकाणी ‘‘बरे आहे, कळवितो’’ या आशीर्वादावर फराळाचा फन्ना उडवून परत येतात.
कित्येकजण स्वतः मुलगी पाहून पसंतीचा रुकार दिल्यावरसुद्धा
आमच्या आईला मुलगी पाह्यची आहे,
इकडे पाठवा, असे निरोप पाठवितात आणि तसे मुलीच्या गरजवंत बापाने केल्यावर मुलगी आईला पसंत नाही, सबब भरवशावर राहू नये असा बेशरमपणाचा निरोप पाठवितात. जणू काय त्यांच्या आईलाच त्या मुलीशी लग्न करावयाचे होते! या लग्नसराईत ठिकठिकाणच्या मुली नुसत्या पाह्यला जाण्याचा आणि शेवटी नकार पाठविण्याचा जणुकाय धंदाच केल्याची उदाहरणे शेकडो सापडतील. आमच्यातील कित्येक सुशिक्षित तरुणांनी फुरसदीच्या दिवशी ४-५ कुमारिकांच्या परीक्षा घेण्यात असला फुकट मानापानाचा, गडगंज फराळाचा धंदा करून, आपल्या नीच आणि क्षुद्र मनोवृत्तीचे असले प्रदर्शन करावे, ही फार खेदाची गोष्ट होय. त्याचप्रमाणे एकाच कुमारीला पहाण्याकरिता जेव्हा एकामागून एक अनेक नवरदेव येऊन तिच्या बापाच्या फराळाचा फन्ना उडवितात आणि तिची पहिल्याप्रमाणेच दरखेपेस परीक्षा घेतात, तेव्हा त्या मुलीच्या मनावर अपमानाचा, निराशेचा आणि वैराग्याचा काहीचका परिणाम होत नसेल?
एकाच मुलीला एकामागून एक अशा अनेक नवरदेवांनी पाह्यला येणे, दरखेपेस तिच्या बापाने त्या पाहुण्यांची हरदास्त ठेवणे आणि सरतेशेवटी अटींचा सौदा जमत नाही म्हणून काराचे उत्तर पाठविणे, हा सर्व खेळखंडोबा पाहिला म्हणजे मन फार उद्विग्न होते. दर परीक्षेच्या वेळी तोच तोच प्रकार होत असल्याचे पाहून संतप्त झालेल्या एका कुमारिकेने नाइलाजास्तव आपल्या नैसर्गिक विनयाचा बुरखा झुगारून देऊन पाह्यला आलेल्या मंडळींना ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजाने
काय नेहमी पहातात पहातात तरी काय मेले
असे संतापपूर्ण उद्गार काढल्याचे मी पाहिले आहे. अगदी एक ताजे उदाहरण म्हटले म्हणजे आम्हाला मुलगी पसंत पडली तर देण्याघेण्याचा प्रश्न आम्ही झुगारून देऊ असे चारचौघांसमक्ष मोठ्या आढ्यतेने सांगणा-या तरुण सुशिक्षित गृहस्थाचे. यांच्या धाकट्या बंधूंचे लग्न व्हावयाचे होते. (ते अजून अविवाहित राहिले आहेत आणि आजच्या सभेलाही हजर आहेत.) वधूपरीक्षा प्रथम ठराविक आधुनिक पद्धतीप्रमाणे झाली. मुलगी पसंत असल्याचा निकाल दिला. नंतर सुमारे १५ दिवसांपर्यंत सदर्हू गृहस्थाकडील कित्येक नातेवाईक बायका टोळीटोळीने व आळीपाळीने दोन दिवसाआड तीन दिवसाआड त्या मुलीची परीक्षा करायला आणि फराळ झोडायला येतच होत्या. शेवटी मुलीच्या भावाने ‘‘पुढे काय?’’ असा स्पष्ट खुलासा विचारला. तेव्हा वराच्या प्रतिष्ठित भावाने एका नातेवाईक रावसाहेबाकडे बोट दाखविले आणि त्यांच्याबाहेर आम्ही नाही असा साळसूद जबाब दिला. रावसाहेबांचा झोक आणि थाट काय विचारायचा! एका सबंध तरुण मुलाची विक्री करण्याची पुण्यप्रद आणि लौकिकवान् सत्ता त्यांच्या हाती आली होती. मुलीकडील मंडळी रावसाहेबांचा निकाल ऐकण्याकरिता त्यांच्या घरी गेली. मंडळी बसतात न बसतात तोच रावसाहेब मोठ्या अकडीत येऊन म्हणाले, ‘‘आठशे रुपये हुंडा, शिवाय कणी पोषाख. हे पत्करत असेल तर बसा. नाहीतर रस्ता मोकळा आहे.’’ मंडळीतील एकाने नवरदेवाच्या वडील बंधूच्या प्रतिष्ठित आश्वासनाची रावसाहेबांना सूचना केली; पण व्यर्थ! गरीब मुलीचा गरीब भाऊ आठशे रुपये कोठून आणणार? बरे नवरा मुलगा तरी कोणी दिग्विजयी म्हणावा, तर तसेही नाही. भाड्याच्या खोलीशिवाय इस्टेट नाही. जेमतेम कारकुनीपेक्षा अधिक विद्या नाही आणि दरमहा ३५च्या पुढे प्राप्तीही नाही;
फक्त तो पुरुष आहे इतके मात्र खरे! मित्रहो! अशी शेकडो उदाहरणे आज घटकेला आपल्या उच्च आणि प्रतिष्ठित समजल्या जाणा-या हिंदु जातीत घडत आहेत. मी याहीपेक्षा पशुवत् वर्तनाची वधुपरीक्षणाची उदाहरणे देऊ शकेन परंतु वेळेचा अभाव आणि विशेषतः सभ्यतेचा अतिक्रम हे माझ्या मार्गात आडवे येत आहेत. इतके सांगितले म्हणजे पुरे की सध्याच्या वधुपरीक्षणाच्या पद्धतीने आम्ही आमच्या
कुमारिकांना वेश्या बनवीत आहोत
असे जे एका आधुनिक नाटककाराने जळफळून उद्गार काढले आहेत ते सर्वस्वी खरे आहेत, यांत मुळीच संशय नाही. हिंदु स्त्रियांच्या पातिव्रत्याबद्दल आणि त्यांच्या शालीनतेबद्दल मोठमोठी पुराणे झोडणारे आम्ही लोक त्याच स्त्रियांच्या कौमार्यावस्थेत, त्यांच्या विवाहनिश्चयाच्या वेळी त्यांचे वाटेल तितक्या वेळा, वाटेल त्या तरुणांपुढे वाटेल तसे खेचून आणून वधुपरीक्षणाच्या नावाखाली वेश्यांच्या पानपट्टीसारखे घाणेरडे प्रदर्शन करतो, त्या कुमारिकांच्या निष्कलंक मनोवृत्ती नष्ट करण्यास कारणीभूत होतो आणि त्यांच्या निष्पाप हृदयात संतापाचा अग्नि भडकावून त्यांच्या नाजूक चित्तांना खवळून सोडतो;
तेव्हा आम्ही आर्य आहोत की अनार्य आहोत? सुधारक की रानटी? धर्माभिमानी की अधर्मप्रचारक? कोण आहोत तरी कोण? मित्रहो, ही परिस्थिती डोळे झाकून आपण किती दिवस चालू देणार? एकवेळ खून किंवा प्रत्यक्ष व्यभिचार यांचे पातक पुरवले; परंतु निष्कलंक, निष्पाप, मुग्ध कुमारिकांची पावलोपावली होणारी इज्जतीची पायमल्ली आणि त्यांचा अपमान या गोष्टी त्यांना असह्य होऊन त्यांच्या संतप्त हृदयातून निघणारे त्वेषाचे सुस्कारे आणि
मेल्या, तुझा सत्यानाश होवो!
असले विद्युत्प्रभावालाही जाळून खाक करणारे शाप यांपासून कोणाही मनुष्याची सुटका होणे शक्य नाही. ज्यांना will power इच्छा शक्तीचा प्रभाव केवढा दांडगा असतो याची जाणीव आहे, त्यांना या शापांचा निश्चित प्रभाव तेव्हाच समजेल. दुर्वास ऋषींच्या शापांना कदाचित उःशापाची सवलत असेल; परंतु अपमानाचा काटा लागून तळतळणा-या
कुमारिकांचे शाप
या शापित महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनाच्या ठिक-या ठिक-या उडविल्याशिवाय खास रहाणार नाहीत. ऐहिक सौख्याला आणि ख-या सांसारिक उन्नतीला आज आम्ही जे पारखे झालो आहोत. राष्ट्रीय सेवेतही आमचे हातपाय जे थरथर कापतात आणि सारे जग जे आज आमच्याकडे नादान म्हणून बोटे दाखवीत आहे, या सा-या अवनतीला कारण, मित्रहो, आमच्याच कुमारिकांचे शाप आहेत. हे लक्षात ठेवा. सामाजिक सुधारणेचा केवढाही आकांत करा, राष्ट्रीय ऐक्याची कितीही लेक्चरे झोडा आणि स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी तुम्ही ओरडून ओरडून आपले घसे कितीही कोरडे करा; जोपर्यंत कुमारिकांच्या शापातून तुम्ही मुक्त झाला नाहीत. तोपर्यंत तुमच्या पदरात कसलेही यश पडार नाही. बसू बिलासारखे सामाजिक जुलमांचा जाच किंचित् तरी कमी करण्यासारखे कायदे विचारार्थ पुढे येताच, धर्माच्या नावाने आकांडतांडव करणारे आणि विवाहसंस्काराची पायमल्ली झाली हो झाली म्हणून भोकांड पसरणारे शालशिष्ट लोक निष्पाप कुमारिकांच्या छळांनी आपले हात आधीच किती माखले आहेत आणि त्यांच्या शापांचे केवढे मोठे पर्वत आपल्या माथ्यावर झाले आहेत, याचा जर क्षणभर विचार करतील, तर त्यांच्या दांभिक वृत्तीचे धुके तेव्हाच वितळून जाईल अशी आशा आहे.
वधुपरीक्षेचा एवढा फार्स होऊन पसंतीचा अभिप्राय सुद्धा मागाहून नापसंतीत का घसरतो, याचे कारण वधुपसंतीनंतर देण्याघेण्याच्या सौद्याचा जो प्रवेश उघडतो त्यांतल्या पात्रांची एकवाक्यता होत नाही. आडपडदा सोडून स्पष्ट सांगायचे म्हणजे वराच्या हुंड्याच्या मागणीच्या तोंडाला वधुच्या बापाच्या खिशाचा तोबरा ठाकठीक बसत नाही, लहान पडतो. आमच्या सामाजिक जुलमांची जर त्यांच्या गुणधर्माप्रमाणे खानेसुमारी काढली तर त्यांत अत्यंत प्राणघातक, समाजस्थितिविध्वंसक व धर्मोच्छेदक पाप म्हणून
हुंड्याचा पहिला नंबर
ठेवावा लागेल. या एका पातकाच्या पचनी आम्ही पडल्यामुळे म्हणा किंवा तेही वडवानळाप्रमाणे पचवून फस्त करण्याइतके अगस्तीचे अवतार आम्ही झालो आहोत म्हणून म्हणा, आमच्या विवाहसंस्काराची सर्व शुद्धता अज्जिबात नष्ट होऊन, त्याला शुद्ध गाई बैलांच्या विक्रीइतके अमानुष स्वरूप आले आहे. विवाह हा एक व्यापार झाला आहे. इतकेच नव्हे तर या एका हुंडापातकामुळे आम्ही अनक दोषांचा प्लेग आमच्या समाजाक्षेत्रांत आम्ही होऊन आणला असून, त्याच्या बाधेने आजपर्यंत
लाखो कुटुंबांचा सत्यानाश
झालेला व होत असलेला आम्ही उघड्या डोळ्यांनी पहात आहोत. तेव्हा धन्य आमच्या धर्माच्या औदार्याची आणि धन्य आमच्या उदार मनोवृत्तीची! मघाशी मी सांगितलेच की काळाच्या ओघाचा जर इतिहास पाहिला तर पूर्वीच्या ब-याच सामाजिक चाली सांप्रत अगदी नामशेष झाल्या आहेत किंवा त्यांची अत्यंत विपर्यासी किंवा संकुचित स्वरूपे सध्या अवशिष्ठ झाली आहेत. अशी वस्तुस्थिती असताना कोणताही सामाजिक सुधारणेचा प्रश्न जनतेपुढे येताच शास्त्रार्थाचा निष्कारण काथ्याकूट करून, आद्य स्मृतिकार मनूच्याच वचनाप्रमाणे देश काल वर्तमानाचा मुळीच विचार न करता, प्रगतीच्या कामी निवळ आडदांडपणे अडथळे आणणे, हे जनहितवादी म्हणविणारांस निःसंशय लाजिरवाणे आहे. हुंड्याचा समाजविध्वंसक प्रघात आमच्यात रूढ झाला आहे आणि त्यामुळे धर्माच्या आणि शास्त्राच्या नावाखाली आमचे आम्ही वैर करण्याची प्रवृत्ती आमच्यात बोकाळली आहे, हे काही आज अगदी नव्याने सांगण्याची जरूर नाही. ब्राह्मविवाहात निमित्तमात्र अंतर्भूत असणा-या वरदक्षिणेवर ‘हुंडा’ हे नवीन वाढलेले विस्तृत व राक्षसी बांडगूळ आहे, हे जीर्ण व नवमतवाद्यांना दोघांनाही अमान्य नाही.
दक्षिणा म्हणजे काय? तर दानाच्या फल प्राप्तीकरिता द्रव्यरूपाने दात्याने याचकाला यथाशक्ती दिलेली देणगी. अर्थात् ती दानानंतर दात्याने आपल्या मर्जीप्रमाणेच द्यावयाची असते. परंतु आमच्या या विवाहातील कन्यादानाचे दान घेणारा याचक
राघो भांग-याचा अवतार
दिसतो. कारण हा याचक आपण किती दक्षिणा घेणार हे दात्याच्या मर्जीविरुद्ध, त्याच्या अवसानाबाहेर स्वतःच ठरवून, प्रत्यक्ष दानाच्यापूर्वी कित्येक महिनेसुद्धा आगाऊच आपल्या पदरात बळजबरीने पाडून घेतो. म्हणजे, धर्मशास्त्रदृष्ट्या आमच्या सामाजिक चालीरीतीने नियमन व्हावे, असा प्रामाणिक आग्रह धरणारांनासुद्धा ही पद्धत शास्त्रनिषिद्ध नाही असे केव्हाही म्हणता यावयाचे नाही. व्यावहारिक दृष्ट्यासुद्धा हा याचक ऊर्फ नवरदेव इतका धाडसी दिसतो की हा दान पडण्यापूर्वीच स्वतःच्या इच्छेप्रमाणे भरपूर दक्षिणा आगाऊच हबकण्याइतका आपल्या मनाचा कोमळपणा आणि सरधोपटपणा व्यक्त करतो. ही आगाऊ खंडणी वसूल करण्याच्या पद्धती व कालमर्यादा ह्या सध्या निरनिराळ्या स्वरूपात सुरू आहेत. कित्येक याचक-वर वधूच्या बापाला एखाद्या तारखेची मुदत देतात आणि त्या तारखेला जर त्याने याचक महाराजांच्या दरबारी खंडणी बिनचूक पोहोचती केली नाही तर
ठरलेल्या लग्नाचा सौदा मोडला
असे समजून दुस-या ठिकाणी सौदा जमविण्याचा याचकाचा हक्क अंमलात येतोय कित्येक यातक सीमांतपूजेच्या वेळी खंडणी वसूल झाली तरी हरकत न घेण्याइतके उदारमतवादी असतात आणि कित्येक मांडवरपरतणीच्या वेळीसुद्धा ‘हुंड्याचा हिशोब’ पदरात पडण्याची वाट पाहण्याइतके ‘व्यापारी पत’ पाळणारे असतात. (सध्याच्या दरिद्री महाराष्ट्र या सीमांतपूजेची ‘श्रीमंतपूजा’ असली अपभ्रष्ट व्यत्पुत्ती करून औट घटकेची श्रीमंती भोगीत असतो. जेथे सारे विवाहच व्यापारी धोरणाने होत आहेत, तेथे श्रीमंती आणि शेटजी या शब्दांना प्रामुख्य का न यावे?) तसेच कायदेपांडित्याचा विशेष अभिमान बाळगणारे
लग्नांतसुद्धा सनदशीर चळवळ
करणारे कित्येक सुशिक्षित आणि कायदेभीरू याचक हुंड्याची रोख रक्कम पदरात पडण्यापूर्वी त्याबद्दल स्टांप मारलेली प्रॉमिसरी नोट आगाऊच हस्तगत करून घेण्यास संकोच बाळगीत नाहीत. वाङ्मनिश्चय म्हटला म्हणजे कन्यादानाचा आणि ते दान वरपक्षाने स्वीकारल्याचा जबानीचा असतो. परंतु वधूच्या घरी साखरपुड्यासाठी येणारी वरपक्षीय मंडळी ही वाङ्मनिश्चयाची खरी दृष्टी घरी विसरून येतात आणि त्यांचा सारा भर जमलेल्या पंचांसमक्ष हुंड्याची रक्कम प्रत्यक्ष वसूल करणे, किंवा तिच्या भरपाईच्या तारखेची मुदत सांगणे किंवा प्रॉमिसरी नोट आणि जातमुचलके घेणे एवढ्याच गोष्टींवर विशेष असतो. ही काही मी अतिशयोक्ती सांगत नाही. असली उदाहरणे आज प्रत्यक्ष व्यवहारात घडत आहेत. तेव्हा असल्या मूलतत्त्वांवरची लग्ने म्हणजे
‘सोशल प्रॉस्टिट्यूशन्’
नाही, असे कोण म्हणेल? आता आपण याच्याही पुढे जाऊन या हुंडापद्धतीच्या आणखी सामाजिक पातकांचा विचार करू या. ईश्वरनिर्मित अपत्यप्रेमांत पुत्रप्रेम निराळे आणि कन्याप्रेम निराळे असा भेद मुळीच नाही. मनुष्य कसल्याही परिस्थितीचा असो त्याला आपल्या मुलाचे चांगले व्हावे आणि मुलीचे होऊ नये असे कधीच वाटत नसते. उलट
कन्या ही अन्याची
ही त्याची कल्पना तिच्या जन्मापासूनच असल्यामुळे मुलापेक्षाही मुलीवर बापाची माया किंचित अधिकच असते. थोड्याच दिवसांनी हा माझ्या पोटचा गोळा मी परक्याच्या हवाली कायमचा करणार ही जाणीव त्याच्या हृदयात वारंवार उमाळे आणल्याशिवाय कशी राहील? परंतु जसजशी ती उपवर होऊ लागते तसतसा तिच्या विवाहासाठी जबरदस्तीने देऊ लागणारा हुंडा त्याच्या पोटात धोंडा घालतो आणि तेथून त्याच्या नैसर्गिक अपत्यप्रेमाची हकालपट्टी करतो. अपत्यप्रेम-अगदी निदानीचा उपाय म्हणून – त्याला असे सांगत असते की तुझ्या मुलीली फार मोठे चांगले स्थळ मिळाले नाही तर नको, निदान तुझ्या तोलाचे तरी स्थळ तिला मिळालेच पाहिजे, परंतु आजकाल या हुंड्याचे मान इतके बेफाम भडकले आहे की मराठी चार यत्ता ढवळून जेमतेम इंग्रजी चवथ्या पाचव्या यत्तेतल्या मुलाचा दरिद्री बापसुद्धा आपल्या
मुलाची किंमत पांचशे रुपये
सांगायला मुळीच शरमत नाही; मग स्वतःच्या घरी दोन वेळा पोटभर अन्न मिळण्याची (केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी असल्या एक फटिंग गृहस्थाच्या मुलाचे लग्न व्हावयाचे होते. मुलाचे विद्याध्ययन अकटोविकटो. एका पुस्तकविक्याच्या दुकानी ‘सेल्समन’च्या हाताखाली हेलपाटी करीत असतो.
मुलाच्या लग्नाबद्दल कोणी विचारले की हे चिंध्या पांघरलेले गृहस्थ त्याला पाच बोटे दाखवीत असत.) मोकांड असली तरी हरकत नाही. सध्याच्या निकृष्ठावस्थेत कोणापाशी इतकी पाचशेची पुंजी मिळणार? नव्हे, जे गृहस्थ आपल्या मुलाच्या पुरुषपणाची एवढी किंमत मागतात, त्यांची किंवा त्यांच्या मुलाची तरी एका वर्षात पाचशे रुपये कमविम्याची लायकी असते काय? शिलकेची तर गोष्टच नको. सरतेशेवटी केवळ अपत्यप्रेमामुळेच मुलीच्या बापाला सावकाराचे घर मारावे लागते आणि दुर्दैवाने जर त्याला पाठोपाठ दोन तीन मुलीच असल्या तर त्यांची लग्ने करता करता बिचारा कर्जाच्या बोजाखाली चिरडून जाऊन अन्नास मोताद होतो आणि आपल्या
दारिद्र्यास मुली कारण
झाल्या असे मानून आजन्म त्यांच्या नावाने चरफडत राहतो. सारांश या हुंड्याच्या चालीमुळे ईश्वरनिर्मित अपत्यप्रेमाचा खून करण्यास आम्ही प्रवृत्त झालो आहोत हे कोणत्याही दृष्टीने महापातकच ठरेल यात संशय नाही. हुंड्याचे हंडे वरचेवर भरून कर्जबाजारी झालेल्या मुलींच्या बापावर खुद्द लग्नसमारंभ चालू असतानाच सावकाराचे
वारंट घेऊन बेलीफ आला
असल्याचे एक हृदयद्रावक उदाहरण माझ्या पाहण्यात आहे. स्वतःच्या विवाहयज्ञात सास-याच्या अब्रूची आणि सर्वस्वाची अशा प्रकारे होळी करणा-या इसमांना आपला संसार आणि इहलोकाची यात्रा मोठ्या सुखात आणि आनंदात जाईल, असा खरोखरच का भरवसा वाटत असेल? जिच्याशी आपण जन्माची गाठ मारून तिला आपली सहचारिणी बनवितो, तिच्याच जन्मदात्या बापाला धर्मशास्त्रनिषिद्ध, सासारविचारनिषिद्ध आणि केवळ रूढीमान्य अशा विध्वंसक हुंड्याच्या गळफासाने दारिद्र्याच्या फासावर टांगल्यावर त्याच्या मानसिक वेदना हेच आपले आशीर्वाद असेच का हे हुंडा खाणारे लोक समजत असतात? आपल्या संसाराचा गाडा नीट चालावा म्हणून दुस-याच्या घराची होळी झाली तरी नैतिकदृष्ट्या ते काही पातकच नाही असाच का या शहाण्यांचा समज असेल? माझ्या एकटीच्या लग्नामुळे माझ्या बापावर कोर्टात फिर्यादीचे भाडभड दावे होत असून, सांपत्तिक अवनतीमुळे माझे लाडके माहेरचे घराणे साफ धुळीस मिळाल्याचे प्रत्यक्ष पहात असताही आपल्या सहचारिणीच्या काळजाला मुळीच पीळ पडत नसतील, आणि त्यांचा परस्पर दांपत्यप्रेमात काहीच परिणाम होत नसेल, अशी या हुंडाप्रवर्तकांची खात्री आहे काय? एक किंवा अनेक मुलींच्या विवाहाच्या पायी एक संबध कुटुंबच्या कुटुंब कफल्लक बनून अन्नास मोताद व्हावे, अशा या हुंडा रूढीचे प्रवर्तक आमचे प्राचीन स्मृतिकार खरोखरच असतील, या मताला धर्मशास्त्रांचा पाठिंबा आहे असे जर धर्मा ...... नी शास्त्रांचे अजूनही प्रतिपादन असेल आणि हुंडा हा ब्राह्मविवाहाचा आत्मा आहे असे जर सुशिक्षित तरुणांना खरोखरच वाटत असेल, तर बेहत्तर आहे कोणी आम्हाला प्रत्यक्ष ईश्वरद्रोही म्हटले तरी, आम्ही असे ठणकावून सांगतो की
धिःकार असो त्या स्मृतींना
त्या धर्मशास्त्रांना आणि त्या आमच्या शिक्षणाला!!! अमुक एक रूढी समाजविध्वंसक आहे इतकी जाणीव उत्पन्न झाल्यावरसुद्धा जर आम्ही तिचा नायनाट करण्यासाठी एकदम एकमताने प्रवृत्त झालो नाही, तर आमची ती सुधारणेची बडबड, ती शिक्षणाची घमेंड आणि तो विद्वत्तेचा तोरा काय जाळावयाचा आहे? पातक हे पातक आहे इतकी खात्री पटल्यावर त्या पातकाला जिवंत जगू देणे हे माणुसकीच्या अवनतीचे स्पष्ट चिन्ह आहे!
श्रीमंतांच्या राण्यांचे पीक नेहमी श्रीमंत घराण्याच्या शेतातच पिकते असा काही नियम नाही. सौंदर्य, सद्गुण आणि संस्कृती या बाबतीत जिच्या नखाग्राचीही सर श्रीमंतांच्या पट्टराण्यांनाही येणार नाही अशा दरिद्री बापांच्या पोटी दुर्दैवाने जन्माला आलेल्या हजारो कुमारिका आढळतील. परंतु सांपत्तिक ऐश्वर्यावरच कुलीनपणाची कसोटी ठरविण्याची खरूज झालेल्या श्रीमंतांनीच मी श्रीमान् आणि तो गरीब असा भेदभाव उत्पन्न केल्यामुळे आणि स्वतःची मुलगी राजाची पट्टराणी होण्याच्या लायकीची असूनसुद्धा केवळ दारिद्र्यामुळे त्या भेदभावाचा तट कुमारिकेच्या गरीब बापाला ओलांडता येत नाही. अर्थात गरीब बापाची मुलगी गरीब घराण्यातच दिली पाहिजे. तिने श्रीमंत वराच्या प्राप्तीची स्वप्नेही पाहू नयेत किंवा आकांक्षाही करू नये, असा जुलमी प्रकार आजला पहाण्यात येतो.
श्रीमंतीचा प्रश्न घटकाभर बाजूला ठेवला तरी एखाद्या गरीबाची मुलगी कितीही सुंदर, सुस्वभावी व सुशिक्षित असली, तिच्या प्रेमळ आईबापाला तिला ‘विद्वानात हिरा’ असा सर्वगुणसंपन्न नवरा मिळावा असे वाटत असले आणि तसला
नवरा विकत घ्यायला
लागणारा हंडाभर हुंडा मात्र त्यांच्यापाशी जर नसला तर नाइलाज म्हणून अपत्यप्रेमाची दृष्टी साफ आंधळी करून, त्यांना आपले लाडके कन्यारत्न एखाद्या माकडाच्या गळ्यात बांधण्याचा प्रसंग आल्याची उदाहरणे आज शेकड्यांनी दाखविता येतील. त्याचप्रमाणे श्रीमंतीचा ताठा आणि गर्व वाहणा-या श्रीमंतांची दृष्टी मुलीच्या गुणांपेक्षा आपल्याच श्रीमंतीच्या तोलाच्या व्याह्याकडून येणा-या हुंड्याच्या घबाडाकडे असल्यामुळे, स्वतःच्या सुस्वरूप आणि सुशिक्षित मुलाच्या गळ्यात श्रीमंत बापाची कुलक्षणा आणि कुरूप मुलीची घोरपड पडल्याचीही उदाहरणे काही कमी नाहीत. अशा रीतीने हुंड्याच्या रूढीचे पिंड खाऊन खाऊन फुगलेल्या या गरीब-श्रीमंत भेदभावाच्या कावळ्याने सा-या हिंदुस्थानात
विषमविवाहाचा खरकटवाडा
करून ठेवला आहे. ही घाणेरडी खरकटी काढून टाकून हिंदुसमाजाचे वैवाहिक क्षेत्र स्वच्छ करण्याची सद्बुद्धी जर आमच्यात अजूनही जागृत व्हावयाची असेल, तर पाश्चात्य राष्ट्रे आम्हाला त्यांच्या पायतणाचीही किंमत देत नाहीत आणि आमच्या राष्ट्रीय चळवळींना ‘साबणाचा फेस’ समजतात, ते खरोखरच वावगे नाही. स्वतःच्या तोंडावरच अनेक सामाजिक जुलमांचा चिखल लागलेला असताना राष्ट्रीय स्वातंत्र्याची मागणी करायला जेव्हा आम्ही जातो, तेव्हा आमच्या मूर्खपणाची डिग्री किती अंशापर्यंत उंच चढली आहे हे दाखवायला परमेश्वराने आता एक नवीन
मूर्खोमीटर यंत्र
काढले पाहिजे खास! बापाचे दारिद्र्य मुलीच्या मनोरथाच्या आड यावे, नव्हे, त्याने तिच्या सा-या जन्माचे विषम विवाहाच्या चरकात रगडून पीठ करावे, ही कल्पनाच अत्यंत हृद्यविदारक आहे. एका हुंडारूढीच्या यज्ञांत कितीतरी कुमारिकांचे बळी पडून विषम विवाहाच्या ज्वाळांनी आज आमच्या हिंदुसमाजाचे तोंड करपून जाऊन, त्या कुमारिकांच्या शापांनी आमची स्वतःची तोंडेही काळीठिक्कर पडलेली नाहीत असे म्हणणारा मनुष्य एक तर जन्मांध असला पाहिजे किंवा ढोंगी तर असला पाहिजे. हुंड्याच्या चालीचा मागेच नायनाट न केल्यामुळे असंख्य विषमविवाहांनी आमच्या सांसारिक आणि सामाजिक परिस्थितीत बराच घोटाळा उत्पन्न केला आहे, मघाशी सांगितल्याप्रमाणे सांप्रत हिंदुसमाजात देशद्रोही, समाजद्रोही, जातिद्वेष्टे, लांगूलचालनी, परान्नपुष्ट अशी जी प्रजा बोकाळलेली दिसत आहे, ती सारी या विषमविवाहाचीच संतती आहे, हे आणखी स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता नाही. आईबापांच्या अंगी हुंडा देण्याचे सामर्थ्य न राहिल्यामुळे जसा विषमविवाहाचा अनर्थ आमच्या समाजात बोकाळला आहे. यापेक्षाही आणखी एक महाअनर्थ आमच्या गरीब आणि मुग्ध कुमारिकांचा बळी घेण्यास सोकावलेला आहे. सर्व इंद्रिये शिथिल झाली असून पूर्ण वार्धक्य आलेल्या आणि घरात नातूपणतू नांदत असलेल्या
श्रीमंत भुजंगनाथ
थेरडोबाला व्यंकोबाच्या गिरीसारख्या क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन चातुर्मासातही लग्नाचा पाचवा किंवा सहावासुद्धा मंगल प्रसंग उरकून घ्यावा लागतो; अर्थात बालावृद्धविवाहाचा भयंकर परिणाम उघड उघड जाणूनसुद्धा आपली मुलगी त्याला देण्यास तयार होणारे बरेच मुलीचे बाप हुंड्याच्या चालीपुढे टेकीस आलेलेच असतात. वराची इतर परिस्थिती जरी घटकाभर दृष्टीआड केली, आणि केवळ तो मुलीला वयाने योग्य आहे एवढ्याच मुद्यावर जरी शोधून काढला, तरीसुद्धा तसल्याही मुलाचा बाप कमीत कमी शेदीडशे रुपये हुंडा मागितल्याशिवाय रहात नाही. शेदीडशे कवड्यालाही महाग असलेल्या मुलीच्या बापाने एवढा हुंडा कसा आणि कोठून आणून द्यायचा? बरं, मुलीला तर अविवाहित ठेवता येत नाही असे पडले धर्मशास्त्र! तेव्हा काय करणार बिचारा! प्रसंगाकडे (कुमारिकांची लग्नें म्हणजे प्रसंग, अं? शिव शिव!!) लक्ष देऊन अपत्यप्रेमास रजा देतो आणि डोळे मिटून पाऊणशे वयोमानाच्या जिवंत प्रेताच्या गळ्यात आपली कोवळी पोरगी खुळा बांधून मोकळा होता.
त्याचप्रमाणे विषयवासना अनिवार म्हणून म्हणा, पुत्र नसला तर नरकात पडण्याची धर्मशास्त्र्यांनी दिलेली तंबीवजा भीती टाळण्यासाठी म्हणा, किंवा आपल्या संपत्तीचे हिडीस प्रदर्शन करण्यासाठी म्हणा, एकामागून एक अशी अनेक लग्ने करून एकाच घरात
छप्पन सवतींचे सवते सुभे
निर्माण करणा-या नित्यनव्या नवरदेवाला आपली मुलगी देणारे लोक म्हणजे हुंडा देण्यास असमर्थ असलेले मुलींचे बापच होत. समजू लागल्या दिवसापासून गुणसंपन्न, प्रेमळ आणि तरुण पतीची अपेक्षा करीत राहिलेल्या गरीब कुमारिकेवर बापाच्या दरिद्री परिस्थितीमुळे अवचित एखाद्या जख्खड थेरड्यापुढे किंवा पूर्वीच्या जिवंत नऊ बायकांच्या तांड्याच्या यजमानापुढे त्याची पत्नी म्हणून उभे रहाण्याचा प्रसंग आला असता त्या बिचारीच्या मनाची स्थिती काय होत असेल याची कल्पना
जावे त्याच्या वंशा तेव्हां कळे!
कोणत्याही पट्टीच्या वक्त्याला किंवा कसलेल्या लेखकाला त्याचे शब्दचित्र काढणे केव्हाही शक्य नाही. वांद्रयाच्या कसाईखान्यात दररोज शेकडो गाईंचा गोवध होतो म्हणून आपण हिंदूलोक – हातात सत्ता नसताही – वर्तमानपत्रांतून आणि व्याख्यानांतून केवढ्या जोराने व किती त्वेषाने आपला संताप व्यक्त करतो. परंतु तेच आम्ही अन्यायद्वेष्टे आणि न्यायप्रिय हिंदूलोक आमच्याच हातांनी हजारो मुग्ध कुमारिकांना विषमविवाहाच्या प्रचंड शिळेवर ताडकन् आपटून त्यांच्या आयुष्याची माती करताना मात्र एखाद्या विवेकी साधूप्रमाणे संतापाचा जोर मनातल्या मनात दडपून, उलट
शुभमंगल साssवधान्
म्हणून दात काढून टाळ्या पिटतो!! हे गौडबंगाल नव्हे काय? नवरानवरीच्या परस्पर वयांतील अंतर जर काही विशिष्ठ मर्यादेच्या बाहेर गेले तर त्यांचा शरीरसंबंध शेकडा ८५ प्रमाणात नवरीच्या अपमृत्यूस कारण होतो, असे आमच्या वैद्यकशास्त्र्यांनी कधीच जाहीर केलेले आहे आणि त्याच विधानाला अलीकडील पाश्चात्य शास्त्रीय शोधांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. आम्ही जर आपल्या माणुसकीवर उपकार करण्याकरिता डोळे उघडून बिजवराची गोष्ट एकवेळ बाजूला राहू द्या – तिजवर चारवर पाचवर सहावर पदव्यांची मजल गाठणा-या नित्य नव्या नवरोबाची चरित्रे पाहिली तरी हाच अनुभव आलेला स्पष्ट दिसेल. निर्भीड परंतु दयाळू इंग्रज सरकारने काही वर्षांपूर्वी धर्माचा मुखवटा घालून आमच्यात बोकाळत असलेली कन्याघाताची चाल जरी बंद पाडली आहे, तरी
दर लग्नसराईत कॅन्डीडेट
उभा राहून एकामागून एक ‘वर’ होणा-या वरपुरुषास आपल्या मुली देणा-या आईबापांनी हीच कन्याघाताची चाल किंचित् निराळ्या स्वरूपात अजूनही कायम ठेवली आहे. एखाद्या श्रीमंत रावसाहेबाची किंवा निदान खाऊन पिऊन सुखी असणा-या ऐदोपंताची पहिली बायको त्याच्या ३५व्या वर्षी मेली की तिच्या तेराव्याला पंधरा दिवस होतात न होतात तोच दहा बारा वर्षांची कुमारिका त्याला बायको मिळते. पाचएक वर्षांत ती बिचारी
भरल्या मळवटाने मरते
न मरते तोच तिसरी अप्रौढ कुमारिका हातात माळ देऊन त्याच्यापुढे ढकलण्यात येते. अशी ही लग्नाची आवृत्ती कमीत कमी पाच सहावेळा भोगण्याचे ऐश्वर्य पुष्कळांनी प्राप्त करून घेतल्याची उदाहरणे प्रत्येक आळीत आणि गल्लीतही दाखविता येतील. तिजवराला किंवा चतुर्थवराला मुलगी दिली असता आपली मुलगी ‘असतां आवुक्ष’ मरणार हे धडधडीत जाणूनसुद्धा जो बाप तिला मृत्यूच्या भयंकर जबड्यात लोटण्यास तयार होतो, तो प्रथमवरास द्याव्या लागणा-या जबरदस्त हुंड्याचे त्राण अंगी नसल्यामुळेच तयार होतो. या शिवाय लंगड्या, लुळ्या, आंधळ्या मनुष्यास मुलगी देऊन तिच्या जन्माचे मातेरे करणारी आणि कन्याविक्रयासारखी धर्मनिषिद्ध आणि सारासार विचारशून्यतेची पशुवृत्तीची अनेक उदाहरणे आहेत, ती किती सांगावी? मित्रहो, या सगळ्या सामाजिक
अनर्थांचे मूळ हुंडाच
आहे, हे आणखी स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता आहे काय? या एकाच पातकाने आपल्या समाजात केवढा कहर उसळून दिला आहे, किती मुग्ध हतबल कुमारिकांचा प्रत्येक लग्नसराईत प्राणनाश होत आहे, सांपत्तिक शोष कितीतरी गरीब कुटुंबांचा समूळ उच्छेद करीत आहे, आमच्या माणुसकीच्या तोंडाला किती काळोखी लागली आहे, आणि धर्मशास्त्रांच्या नावावर वाटेल ते सामाजिक अत्याचार करण्यास आम्ही किती निर्लज्ज झालो आहोत, याचा विचार केला म्हणजे शरमेने ज्याची मान खाली होणार नाही, असा एकही सद्विचारी मनुष्य सापडणार नाही.
आता आपण हुंड्याच्या प्रघाताच्या योग्यायोग्यतेच्या प्रश्नाकडे वळू या. ब्राह्मविवाहात ‘वरदक्षिणे’चे एक कलम आहे; पण त्याचा इतका विचका करणारे शहाणे वंशज कधीकाळी पुढे निपजतील आणि
दक्षिणेला जबरदस्तीच्या खंडणीचे रूप
देतील, असे जर त्या स्मृतिकारांना दुःस्वप्न पडते, तर त्यांनी हे घातकी दक्षिणेचे कलम कायम ठेवून कुमारिकांच्या शापांस स्वतः पात्र करून खास घेतले नसते. गंगा उगमाजवळ अत्यंत शुद्ध आणि निर्मळ असते; परंतु तिच्यात पुढे ढवळाढवळ करून तिच्या शुद्ध प्रवाहात चिखल करणारे तिचेच परिजन. हुंड्याच्या पापाचे माप स्मृतिकारांवर लादणे हा शुद्ध कृतघ्नपणा होय. या पापाचे धनी आमचे आम्हीच आहोत आणि त्याचे प्रायश्चित्तही आमचाच समाज भोगीत आहे. सध्या या वरदक्षिणेचे हुंड्यांत झालेले रूपांतर पाहिले म्हणजे मुलीच्या बापाकडून उकळविलेली रकम ही नवरे-मुलाच्या पौरुषत्वाची किंमत किंवा अधिक स्पष्टच सांगायचे म्हणजे त्यांच्या
पुरुषपणाची किंमत
म्हणणे अधिक वाजवी होईल. कारण पौरुषत्वाची किंमत घेतो म्हणणा-यांना आपल्या स्वतःची आणि आपल्या मुलाची पौरुषत्वाच्या ताजव्यात काय किंमत होईल याची पूर्ण जाणीव नसते असे नाही; तेव्हा ही मुलाच्या पुल्लिंगत्वाचीच किंमत होय, असे कबूल केल्याशिवाय त्यांची सुटका नाही, बरे, पौरुषत्वाची किंमत असे जरी घटकाभर गृहित झरले, तरी ज्या मानाने ती उकळली जाते, त्या मानाने पौरुषत्वाचा प्रभाव निदान आमच्या महाराष्ट्रांत तरी मुलीच दिसत नाही. महाराष्ट्रात पौरुषत्व शिल्लक आहे हे वाटेल तर नाटकगृहात राणा भीमदेवाचा प्रयोग करताना म्हणा किंवा भगवा झेंडा शिवाजी महाराज जरीपटका वगैरे शब्दप्रयोगांची रेळवेळ करून मनोवृत्ती खवळून सोडणा-या वक्त्याच्या व्याख्यानांत टाळ्या पिटताना म्हणा; पण टाळ्या पिटून बाहेर पडल्यावर काय आहे? तात्पुरती चेतना आणि तात्पुरतेच ते नाटकी पौरुषत्व! याच्या पलीकडे आमच्या महाराष्ट्रात काहीही उरलेले नाही. एवढे खरे की आमच्यासारखे
टाळ्या पिटण्यात बहाद्दर
सा-या पृथ्वलीतलावर दुसरे कोणीही नाहीत. आजकाल नुसती व्याख्याने देणारे जोपर्यंत रगड आहेत, तोपर्यंत नुसता टाळ्यांचा कडकडाट करून पौरुषत्व गाजविण्या-या श्रोत्यांचा त्यांना कधीही तुटवडा पडणार नाही. असो. हुंडा घेताना तो शास्त्रमान्य आहे, वरदक्षिणा तो न घेतला अगर न दिला तरवराचे आणि वधूचे घराणे एकदम नरकाच्या वाटेला लागेल, असल्या पापभीरू कल्पनांच्या पायावर काही ही सट्टेबाजी चाललेली नाही. साधारण सुखवस्तु लोकांचे उदाहरण आपण क्षणभर बाजूला ठेवू; परंतु मध्यम वर्गाची जर स्थिती पाहिली तर त्यांचे हुंडा हबकण्याचे कारण स्वतः त्यांजवळ त्यांचे
लग्न करायला पैशेच नसतात
हे होय. बाहेरून ते वाटेल तितका जामानिमा करतात, लग्नसराईच्या हंगामात मोठी सुखवस्तुत्वाची ऐट आणतात, लग्नाबद्दल बेपरवाई दाखवितात; वगैरे नाटक तर खूप करतात परंतु अंदरकी बात राम जाने! पण लग्न करायचेच तर त्याच्या खर्चाचा सगळाच बोजा मुलीच्या बापावर हुंड्याच्या मिषाने लादण्यात उघडउघड आपण आपल्या सांपत्तिक नालायकीचे आणि मनगटाच्या कमजोरीचे प्रदर्शन करीत आहोत, हे मात्र या गृहस्थांना कळत नाही; तथापि लोकांना ते उमगत नाही असे थोडेच आहे? त्यांचा सारा भर मुलाच्या पुल्लिंगत्वावर आणि मुलीच्या बापाच्या गरजूपणावर; यापलीकडे प्रत्यक्ष माणुसकीचाही प्रश्न ते उघडे डोळे असून पहात नाहीत. त्यातून मुलगा जर
मातृक्लेशन परीक्षा पास
झालेला असला तर मग काय अगदी गगनाला हात पोहचला! मग त्या बेट्याची कारकुनीच्या हमालगिरी पलीक़डे जरी अक्कल नसली किंवा ७-८ मंडळींचे कुटुंब पोसण्याची धमक त्याच्या अंगात नसली तरी हरकत नाही. मुलगा आहे, मॅट्रिक आहे, मॅट्रिक आहे, मुलगा आहे, या मंत्राच्या जपाने हुंड्याचा हंडा हस्तगत करण्याची काय ती सारी धडपड. कित्येक मुलांचे आईबाप हुंडा का घेणार याचे उत्तर मुलाच्या शिक्षणाकरिता झालेला खर्च भरून यावा म्हणून, असे साळसूदपणाचे सरळ उत्तर देतात.
आता, यांच्या या विद्यावंत मुलाच्या विद्येचा खर्च कवडीन् कवडी भरपाई करण्यात मुलीच्या बापाला आणि प्रत्यक्ष मुलीला कोरड्या अभिमानापेक्षा अधिक फायदा तर नाहीच नाही; पण खरी वस्तुस्थिती पाहिली तर खुद्द त्या विद्यावंत मुलालाही आपल्या विद्येपासून खर्डेघाशीपलीकडे अधिक लाभ झाल्याचे ऐकिवात नाही. मॅट्रिक स्कूल फायनलवाली मंडळी तर राहूद्याच बाजूला, पण आमचा मुलगा बी.ए. आहे, दीड हजाराला कपर्दीकसुद्धा कमी घेणार नाही, अशी माफक मागणी करणारांच्याही ग्रॅज्युएट चिरंजिवांनी आजपर्यंत दीड हजाराच्या हुंड्यास निदान शोभेल असे काय मोठे दिग्विजय लावले आहेत? नुसत्या परीक्षेला महत्त्व देऊन त्यावरच जर बेसुमार हुंडा हबकण्याचा पौरुषत्वाचा हक्क शाबीत होत असेल, तर आजपर्यंत प्रत्येक गावात जेवढे
वॅगनलोडभर ग्रॅज्युएट्स्
दिसतात, त्यांच्या संख्येवरून सा-या महाराष्ट्रातील या सुविद्य आचार्यांनी हा देश तर यावेळी अगदी उन्नतीच्या शिखरावर नेऊन पोहोचवायला पाहिजे होता! म्हणजे विद्याप्रीत्यर्थ खर्चाची भरपाई केल्याचे प्रत्येक सास-याला काही मानसिक समाधान तरी वाटले असते. परंतु आजकालच्या देशपरिस्थितीकडे लक्ष पुरविले असता इंग्रजी पाचवी यत्ता ढवळणारा, मॅट्रीक आणि शेकडो रुपये खर्च करून आचार्य पदवी पटकविणारा ग्रॅज्युएट ही सर्व मंडळी उदरनिर्वाहाच्या मंडपात बहुशः एकाच पंक्तीला बसलेली आढळतील. तेव्हा नुसत्या विद्येच्या सबबीवर हुंड्याची मागणी करणे हे काही सारासार विचारास पटत नाही. शिवाय विद्येच्या सबबीवर सोय-याकडून हुंडे हबकणारे हे लोक एक गोष्ट अजिबात विसरतात. हुंडा देणे न देणे ही गोष्ट जरी मुलाचे बाप बाजारपेठेतल्या वाण्याप्रमाणे
परवडेल तर घे, नाहीतर जा
म्हणून मुलीच्या गरजू बापाच्या इच्छेवरच सोपवितात, तरी जो म्हणून मुलीच्या भावी सुखाची काल्पनिक आशा करून सुविद्य जावयाला हुंडा देऊन आपण स्वतः खंक होतो किंबहुना आपल्या घराण्याला सांपत्तिक दृष्ट्या कर्जबाजारी ऊर्फ लंजूर करतो, त्याबद्दल प्रत्यक्ष जावईबुवांचे शिक्षणच जबाबदार ठरते. तेव्हा आपल्या स्वतःच्या शिक्षणाच्या पायी एका परक्या कुटुंबाचा सांपत्तिक –हास करणे म्हणजे त्याच शिक्षणाचा आपल्यावर काहीही संस्कार झालेला नाही अशी अप्रत्यक्ष कबुली देण्यासारखे नाही का होत? ज्या शिक्षणाने हुंड्यासारख्या समाजविध्वंसक रूढीचा पुरस्कार केला जातो. ते शिक्षणच नव्हे आणि त्या युनिव्हर्सिटीच्या डिग्र्या ही काही विचारप्रगल्भतेची लक्षणेही नव्हेत!! असे म्हणणे प्राप्त होते. हुंड्याच्या रूढीच्या समर्थनार्थ आणि स्वतःच्या पापावर पांघरूण घालण्यासाठी हुंडा घेण्यास प्रवृत्त झालेल्या किंवा साकावलेल्या लोकांच्या सबबींचा इतिहास फार विस्तृत आणि मनोरंजकही आहे. परंतु त्यांच्या सबबीच त्यांच्या अंतस्थ स्वार्थी हेतुंची परिस्फुटता करण्याइतक्या पारदर्शक आणि फोल असतात. स्वतःच्या लग्नाचा खर्च करण्याची ऐपत नाही म्हणून किंवा शिक्षणाचा खर्च सव्याज फेडून घ्यायचा आहे म्हणून हुंडा घेण्याची आवश्यकता पुढे मांडणा-या लोकांपेक्षा आणखी एक दुसरा हुंडाखाऊ वर्ग आहे. या वर्गाच्या सबबी सरड्याच्या रंगाप्रमाणे वारंवार बदलणा-या असतात; परंतु ‘परवडेल तर बोला’ या ब्रह्मास्त्राखेरीज त्यांच्याजवळ विशेष चर्चा करणे सोयीचे नसते. या लोकांच्या हुंड्याच्या आकड्यात स्वतःच्या
घरच्या कर्जाचा समावेश
करण्यात आलेला असतो. आता, मित्रहो, विचार करा. स्वतःच्या उधळेपणाने किंवा अशाच दुस-या कारणाने झालेल्या कर्जाची फेड मुलीच्या बापाच्या मानेवर बसून करून घेणे म्हणजे पशुवृत्तीलाही लाजविणारे कृत्य नव्हे काय? विवाहासारख्या अत्यंत मंगल, अत्यंत महत्त्वाच्या विधीच्या नावाखाली स्वतः कर्जमुक्त होण्यासाठी दुस-याला कर्जाच्या फासावर लटकविण्याची वृत्ती ही काही मानवी दिसत नाही; ही खास राक्षसी वृत्तीच होय.
असतील बाळ तर फेडतील काळ
या उदात्त म्हणीचा उपयोग अलीकडे बरेच आईबाप मुलांच्या संख्येवरून त्यांच्या लग्नांत येणा-या हुंड्याच्या अनुमानाप्रमाणे वाटेल तसे आगाऊ उधळेपणाने कर्ज करून ठेवण्याकडे करीत असल्याचे पहाण्यात येते.
साधारण शिकलेले आणि नोकरी करू लागणारे दोनतीन तरुण मुलगे घरात असले म्हणजे स्वतः अत्यंत दरिद्री असूनसुद्धा केवळ त्या मुलांना येणा-या भावी हुंड्यांच्या आशेवर-मुलांच्या कर्तबगारीच्या धमकीवर नव्हे हो!- हुंड्याच्या आशेवर त्या मुलांना
चालत्याबोलत्या प्रॉमिसरी नोटा
मानणारे आईबाप आजकाल बरेच दिसू लागले आहेत. ही तर मध्यम वर्गाची स्थिती. परंतु सुशिक्षितांनी व पदवीधरांनी गजबजलेलीही बरीच घराणी याच मताची आढळण्यात येतात, हे मात्र अत्यंत शोचनीय आहे. माझ्या ओळखीच्या अनेक उदाहरणांपैकी एकच असले उदाहरण मासल्याकरिता सांगतो. हे गृहस्थ मोठ्या सुखवस्तु घराण्यातले आहेत. यांचे वडील व चुलते मोठ्या हुद्यावर असून घरात दरमहा तीनचारशे रुपये एकत्र तनखा येत असतो. हे गृहस्थ बी. ए. झाल्यावर लग्नाला उभे राहिले आणि एलेल्बीच्या वर्गात जाऊ लागले. प्रथमवर, बी. ए., एलेल्बी होणार, घराणे मोठे, सुखवस्तु तेव्हा एकदम
हुंड्याची उडी हजारावर
गेली; परंतु एका मुलीच्या बापाने आठशेपर्यंत जेमतेम सौदा पटवला. मुलाच्या कुंडलीतच असा योग होता म्हणतात की नुसत्या त्याच्या लग्नांच्या हुंड्यांच्या रकमांनीच गडबोल्यांकडे तीन पिढ्या गहाण पडलेली शेतवाडी सुटायची होती; तेव्हा त्या कुंडलीचे भविष्य खरे करण्यासाठी पहिल्या लग्नाच्या वधूने केवळ सहा महिन्यांतच परलोकचा रस्ता धरला आणि तिच्या पत्निनिष्ठ पतीने आपले शोकोद्धार कवितेच्या रूपाने एका प्रसिद्ध मासिकात प्रसिद्ध करून द्वितीय लग्नाला स्वारी उभी राहिली. प्रथम पत्नीच्या वियोगाच्या दुःखावर दडपण पडावे म्हणूनच की काय कोण जाणे मागील हुंड्याच्या आकड्यावर आणखी पाचशेचे दडपण ठेवून, तेराशे रुपयांच्या माफक वरदक्षिणेसह या आमच्या सुशिक्षित गृहस्थाने द्वितीय पत्नीला आपल्या हाताचे पाणीग्रहण करण्याची परवानगी दिली. हिच्याही वेळी पुन्हा
कुंडली आडवी आली
आणि आपल्या सवतीच्या विसरभोळेपणाचा कित्ता न गिरविता, एक मुलगा आणि एक मुलगी यांचे आपले कायमचे स्मारक मागे ठेवून तिने राम म्हटला. झाले, संसार उघडा डला. तेव्हा अगदीच नाइलाज म्हणून तृतीय विवाहाला ही स्वारी उमेदवार राहिली. यावेळी हुंड्याच्या पातकाची पुसटपुसट जाणीव त्यांना उत्पन्न झाल्यामुळे म्हणा किंवा गहाण शेतवाडी सोडवायला यांच्या कुंडलीला आता फक्त पाचशेच रुपयांची जरूर राहिल्यामुळे म्हणा, या बीए एलेल्बी डबल ग्रॅज्युएटाने केवळ पाचशे रुपयांचीच वरदक्षिणा घेऊन तृतीय पत्नीचा अंगिकार केला आणि न्यायशास्त्राच्या अभ्यासाचा स्वतःच्या मनावर केवढा उदात्त परिणाम झाला याचे प्रदर्शन केले. हल्ली हे सभ्य गृहस्थ सबजज्ज असून न्यायदानाचे पुण्कृत्य करीत असतात. यांची वडिलार्जित शेतवाडी आता गहाणाच्या घाणीतून मुक्त झाली असून हुंड्याच्या प्रसादाने यांचे घराणे घरंदाज, शेतकरी वगैरे अभिमानास्पद मान्यतेने सुखात कालक्रमणा करीत आहे. कोणत्याही दृष्टीने विचार केला तरी हुंडा घेणे या दुष्कृत्याचे समर्थन करणारी एकही सबब सापडणे मुष्किलीचे आहे. समाज सुस्थितीत असला, देशही भरभराटीत असला, आणि प्रच्छन्न विपुलतेमुळे सर्वत्र परिस्थितीचा रथ अप्रतिहत रीतीने – एकही ठिकाणी न ठेचाळता – फिरू लागला की प्रत्येक समाजात एक प्रकारचा निष्काळजीपणा, अदूरदृष्टी आणि चैनबाजी यांचा प्रसार होतो. अशा वेळी निव्वळ मोठेपणा आणि चैनबाजी यांचे प्रदर्शन करण्याकरिता कित्येक नवीननवीन चाली समाजात रूढ होतात; आणि स्वतः मनुष्य कट्टा अनुकरणप्रिय असल्यामुळे त्या चालींचा त्वरित प्रसार होऊन त्यांना रूढींचा पोलादी मुखवटा चढतो. पुढे त्या रूढींच्या अस्तित्वापासून ज्यांना ज्यांना काही लभ्यांश दिसतो, ते ते त्या पोलाजी मुखवट्याच्या आत धर्मशास्त्राधाराचे मखमली अस्तर लावून, त्या रूढींना धर्मशास्त्रांचा पक्का बाप्तिस्मा देऊन टाकतात आणि हिंदुलोक स्वभावतःच पापभीरू असल्यामुळे धर्म आणि शास्त्र या नावाच्या महामंत्रापुढे हतबल होऊन वाटेल त्या सदोष आणि घातकी रूढीपुढे आपली मान विकविण्यास तयार होतात. हुंड्याच्या रूढीचे सांप्रत आपण जे राक्षसी स्वरूप पहात आहोत, त्याचा प्रथम उगम सकृद्दर्शनी अगदी क्षुल्लक दिसणा-या वरदक्षिणेतून होत होत अखेरीस त्याला हे हिडीस स्वरूप प्राप्त झाले आहे, हे हुंड्याचे समर्थ करू पहाणा-यांनासुद्धा नाकबूल करता यावयाचे नाही.
थोडक्यात समारोप करायचा तर हुंडा घेणे किंवा देणे हे धार्मिकदृष्ट्या निखालस पाप आहे; स्मृतीत सांगितलेल्या लग्नविधीत
हुंड्याच्या मागणीचा समावेश
होऊ शकत नाही आणि कन्या विकण्याइतकेच पुत्र विक्रयाचेही कर्म स्मृतीच्या हेतूंप्रमाणे बिनतक्रार पातक ठरत आहे. आताच सांगितलेल्या दोनतीन ठळक उदाहरणांवरून आपल्या ध्यानी आलेच असेल की कोणत्याही दृष्टीने पहा, हुंडा घेणारांना आपण हुंडा का घेतो याचे धार्मिक किंवा व्यावहारिक विवेकबुद्धीला पटेल असे समर्थन करायला तोंडच नाही. मात्र आम्ही हुंडा घेणार, तुम्हाला वाटले तर आमच्याशी सोयरीक करा, नाहीतर चालते व्हा, एवढ्याच निकरावर ज्यांनी आपली विचारसरणी आणून ठेवली आहे त्या
मुलगेविक्या मारवाड्यांशी
वाद घालण्यात काही अर्थ नाही. आजकालचे हुंडे उकळविणारे लोक धडधडीत पुत्रांचा विक्रा करतात मग या पातकाला वाटेल ते शर्करावगुंठीत नाव द्या, त्यामुळे ते पातक नष्ट व्हावयाचे नाही किंवा त्याचा व्हायचा तो परिणामही झाल्याशिवाय रहात नाही. ता. ३ माहे मार्च सन १९१४ च्या केसरीत
हुंड्यावर बहिष्कार
म्हणून जो एक उत्कृष्ट, विचारपूर्ण आणि व्यापक दृष्टीचा निबंध लिहिला आहे, त्यातील एक कलम मी आपणास वाचून दाखवितो. केसरीकार म्हणतात ‘‘बिचारे जुने भाविक लोक लग्नाच्या यादीत ‘वरदक्षणा’ असा शब्द लिहून हुंडा घेत. पण सुधारक पहावे तो यादीतून किंवा तोंडी करारातून हुंडा हा शब्द मात्र वगळतात; पण हुंड्याचे पैसे, दागिने, देणग्या, मानपान अशा स्वरूपाने आधी ठरवून घेतात. कित्येक सासू-सारे तर इतके ‘सुधारणा’प्रिय असतात की, असा हुंडा घेऊनच्या घेऊन
‘‘हुंडा दिला असे म्हणाल तर खबरदार’’
असा धाक घालून वधूपक्षीय व्याह्याला तोंड बांधून बुक्यांचा मार देतात. सुशिक्षित जावईही देणग्या मागण्यात मोठे तरबेज झाले आहेत. प्रथम रुसण्याची बोली करावयाची नाही. पण सुशिक्षित जावईसुद्धा एखादा दिवस रुसल्यास त्याचे कौतुकच होते; यामुळे कोणी जावई मौल्यवान हि-याची अंगठी, कोणी सोन्याचे घड्याळ, कोणी बायसिकल, कोणी मोटार, कोणी नुसता
विलायतेला जाण्या-येण्याचा खर्च
असल्या भोळ्या मागण्या करून हुंड्यापेक्षाही जास्त पैशे काढतात; आणि ते देण्याची पाळी आली म्हणजे, प्रत्यक्ष हुंड्याचे गहू आधी बोली करून दिलेले पुरवले, पण त्या गव्हांची ही अशी कणीक करून देणे नको, असे सास-यांना वाटते! एका जावयाने तर निव्वळ श्लेषालंकाराने हुंडा उकळला म्हणतात. त्याने सास-यास फक्त एक ‘बुक’ बक्षिस मागितले. आपला जावई विद्याप्रिय आहे असे पाहून सास-याला प्रथम धन्यता वाटली. पण ‘तुम्हाला कसले बुक पाहिजे?’ या प्रश्नास जेव्हा
एक हजार रुपये भरलेले बँकबुक
असे उत्तर मिळाले तेव्हा त्याची धन्यताबुद्धी लोपून ‘दे माय धरणी ठाय’ असे झाले! मुलीचे पैसे घेण्यात असले फसवाफसवीचे प्रकार तरी होत नाहीत. मुली विकणारा बाप व्यवहाराला ‘चोख’ असल्यामुळे तो आधी सर्व पैसे पदरात घेतो आणि मगच मुलीच्या गळ्याला दावे लावू देतो! कारण त्याला हे माहीत असते की आपल्या हातातला मुलीचा हुकूम, लग्नाचा डाव मांडून विवाहाच्या अक्षता वधूवरांच्या डोक्यावर पडेपर्यंत काय तो खरा. ते होताच दुसरा व्याही किंवा जावई सांगेल तोच हुकूम सुरू होणार?’’ या एकंदर प्रकारावरून हुंडा घेणारे लोक कन्याविक्रयाच्या इतकाच
पुत्रविक्रयाचा नीच धंदा
करीत असतात किंवा नाही, हे अधिक स्पष्ट करून सांगण्याची आवश्यकता आहे काय? कन्याविक्रयाबद्दल आमचे स्मृतिकार म्हणतात –
यः कन्यापालनं कृत्वा करोति विक्रयं यदि ।
विपदा धनलोभेन कुंभीपाकं स गच्छति ।।
कन्यामूत्रं पुरेषेच तत्र भक्षति पातकी ।
कृमिभिर्दशितः काकैयावदिंद्राश्चतुर्दश ।।
तंदतेव्याधितोभूत्वा लभेज्जन्म सुनिश्चितम् ।
विक्रीणाति मांस भारंवहत्येव दिवानिशम् ।।
बिचा-या स्मृतिकारांच्या अंमदानीत नुसते कन्याविक्रय करणारेच कांचनभटजी असावेत असे दिसते; परंतु त्या दूरदृष्टी कोडमेकरांना आमच्या हुंड्यावाल्यांनी मात्र पुरे चकविले खास! पुत्रविक्रयाबद्दल काहीही शिक्षा स्पष्टपणे त्यांच्या कोड्यांत नमूद नसल्यामुळे त्यांचे बरेच पिकले आहे. पण ज्यांना हुंड्याच्या नावाखाली स्वकीयांवरच?‘’
दिवसाढवळ्या दरोडे
घालून लुटण्याची चटक लागली आहे, असे हुंडेवाले स्मृतीने पुत्रविक्रयाचा निषेध जरी उघडपणे अगदी कंठशोष करून केला असता, तरी त्याची थोडीच पर्वा ते बाळगणार होते?
स्मृतींचा पुरावा स्वार्थाकरिता वाटेल त्याने पुढे करावा. The Devil can cite Seripture for his purpose. स्वार्थावरच स्मृतींची धाड येत असली की मग सर्वच सब झूट मानायला काही अवकाश नाही. असो कसाही विचार करा हुंडा उकळम्याची पद्धती ही नुसती निंद्यच नव्हे तर समाजविध्वंसक आहे. समाजांतील घटकावयव या नात्याने प्रत्येकाचे समाजकर्तव्य म्हणून जे मानले गेले आहे, त्या कर्तव्याचा छेद करून अप्रत्यक्ष रीतीने समाजाच्याही छेदाचे पातक हुंड्यामुळे आज मोठ्या प्रमाणावर आमच्या हातून घडत आहे. समाजाच्या सुस्थितीचा पाया त्यांतील प्रत्येक घटकावयवाच्या परस्पर स्वार्थत्यागावरच अवलंबून असतो. समाजाची सांपत्तिक स्थिती त्याच्या भरभराटीला विशेष कारणीभूत होते. सांपत्तिक दृष्ट्या खालावलेले समाज बुद्धिमत्तेच्या बाबतीत प्रत्यक्ष सवाई बृहस्पती असले तरी सांपत्तिक शक्तीच्या घोड्याशिवाय नुसत्या अकलेच्या पायदौडीने उन्नतीची शर्यत त्यांना केव्हाही जिंकता यावयाची नाही. हुंड्याच्या प्रघातामुळे आमचा महाराष्ट्रीय हिंदूसमाज सांपत्तिक दृष्ट्या अगदी खालावलेला झाला आहे. हुंड्याच्या प्रघातामुळे महाराष्ट्राला स्वार्थत्यागाची ओळख मुळीच राहिलेली नाही. हुंड्याच्या प्रघातामुळे आम्ही कट्टे स्वार्थलोलुप आणि ऐदी बनलो आहोत. हुंड्याच्या प्रघातामुळे आमची कर्जबाजारीपणाची प्रवृत्ती फार वाढली आहे. हुंड्याच्या हुकमी प्राप्तीच्या डबोल्याची आम्हाला चटक लागल्यामुळे आम्ही आमच्या जातभाईंच्याही सुखदुःखाविषयी फार बेपर्वा बनलो आहोत. लग्नविधीच्या सोवळ्या नावाखाली बिनतक्रार घर चालत येणा-या शेकडो रुपयांच्या आयत्या प्राप्तीच्या प्रघाताने आमची पौरुषत्वाची दृष्टीसुद्धा पिलपिल करण्याइतकी आकुंचित बनली आहे, आणि उद्योगप्रियता अज्जिबात नष्ट होऊन
आयत्या पिठावर रेघा
ओढायला न करचण्याइतकी आमच्या मनोवृत्तीची संवेदनाच मेली आहे. हुंडा मागण्याचा वराला कोणत्याही दृष्टीने अधिकार नाही, हुंड्याच्या प्रघातामुळे आमच्या सामाजिक सुखाची होळी झालेली आहे, हुंडा घेणे हे शुद्ध पातक आहे, इतक्या सा-या गोष्टी आम्हाला पटल्या आहेत, तसे आम्ही बोलतोसुद्धा, परंतु शेवटी काय? स्वतःच्या लग्नाची पाळी आली की ती सारी पुराणातली वांगी पुराणात राहतात; आणि काहीच सबब पुढे करता आली नाही की ‘‘काय करावे? माझा तर हुंडा न घेण्याचा निश्चय कधीचा; पण काय करावे? आमच्या मामापुढे-काकापुढे-किंवा वडिलांपुढे नाइलाज झाला. त्यांची इच्छा मोडवेना!’’ अहाहा, असले उद्गार जर कोणी एखाद्या अनोळखी पाश्चात्याने ऐकले तर तो म्हणेल ‘‘ओहो, केवढे हो हे महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुण आज्ञाधारक आहेत? वडिलांची इच्छा कधीही मोडीत नाहीत. काय डिसिप्लीन्! केवढे ओबीडिअन्स्!! किती रेवरन्स्!!!
ब्रेव्हो, यंग् मेन् ब्रेव्हो!
वडिलांची आज्ञा अशीच पाळीत जा.’’ पण त्या बिचा-याला काय माहीत आमची खरी मख्खी कशात आहे ती? बिनश्रम करता नुसत्या ‘हूं’वर जर घरात घबाड चालून येत आहे, तर वडिलांची इच्छा गवताच्या काडीपेक्षाही नाजूक असली तरी ती मोडण्याचे पातक कोण सुशिक्षित करील? मित्रहो, स्पष्ट बोलते क्षमा करा, ही असली वृत्ती काही सुविद्यतेची द्योतक नव्हे. तुम्ही बीए व्हा, एमए व्हा, पीएचडी व्हा नाहीतर प्रत्यक्ष बृहस्पती व्हा. जोपर्यंत तुमच्या प्रतिज्ञा अक्षरशः पाळण्याचे नैतिक धैर्य तुमच्यात नाही, तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीला पटलेल्या तत्त्वांना चिकटून राहण्याची जोपर्यंत तुमच्या अंगात धमक नाही, तोपर्यंत तुम्ही
शेकडो भीष्माष्टम्या
आणि हजारो रामनवम्या साज-या केल्यात, तरी त्यामुळे तुमच्या सुविद्यतेची सार्थकता होणे कधीही शक्य नाही. नुसत्या डिग्र्या आणि डिप्लोमे ही काही मनाच्या प्रगल्भतेची किंवा संस्कृतीची चिन्हे खास नव्हेत. अलीकडे लग्नास तयार असलेल्या सर्व जातींच्या तरुणांच्या नावनिशीवार प्रसिद्ध होणा-या
कॉन्फीडेंशल याद्या
पाहिल्या की त्यातील हुंड्याच्या मागणीचे आकडे पाहून छाती दडपून जाते. एखाद्या राष्ट्रकार्याकरिता शुद्ध स्वयंस्फूर्तीचा जोर असतानाही मोठमोठ्या धनिकांना जेवढ्या रकमेचे आकडे घालण्याचा धीर होत नाही, तेवढ्या मोठमोठ्या रकमांची हुंडा म्हणून आमच्या सुशिक्षित मंडळीकडून लेखी जाहीर मागणी करण्यात येते!
मी स्वतः या असल्या याद्या बऱ्याच पाहिल्या आहेत. त्यात शेकडो ग्रॅज्युएटांची, अंडरग्रॅज्युएटांची नावे पत्ते, आईबापांची, घराण्याची, शेतीवाडाची, स्वतःच्या पदव्यांची इ. माहिती असून हुंड्याच्या रकमेचे प्रमाण
पाचशेपासून तीन हजारापर्यंत
दिलेले आढळले. अगदी पहिल्याप्रथम असली एक यादी सहजगत्या जेव्हा माझ्या हाता आली (ती टाइपरायटरवर छापलेली कार्बन कॉपीची, सरासरी ५-६ फुलस्केपची टाचणी मारलेल्या चोपडीवजा होती) तेव्हा –
‘‘एक्स. वाय. झेड. बी. ए.
वय २८. एम्.ए.चा अभ्यास चालू
आईबाप हयात. एक वडील भाऊ नेटीव संस्थानात इंजिनिअर (१२५) धाकटे दोन भाऊ शिकत आहेत. सातारा जिल्ह्यात ** गावी घर व शेतवाडी. विलायतेस जाणार.
रुपये ३०००’’
अशा नमुन्याचा मजकूर वाचल्याबरोबर मला असा भास झाला की, या तरुण सुशिक्षित गृहस्थाने ही तीन हजारांची रकम एखाद्या राष्ट्रकार्याला किंवा शिक्षणकार्याला देऊ केली आहे. परंतु त्या अर्थाने मी पृच्छा करताच, ‘अहो, हा लग्नाला तयार असलेला मुलगा आहे. आणि त्याची हुंड्याची मागणी तीन हजारांची आहे’ असे खडखडीत उत्तर मला मिळाले. आमच्यातील चांगल्या विद्वान् विद्वान योद्ध्यांची मनोवृत्ती जर अशी तर साधारणपणे मॅट्रिक फायनलवाल्यांनी हुंड्याच्या रकमेची पाच बोटे दाखवीत फिरले तर त्यांना काय म्हणून हसावे? अलीकडे तर मुलगा कसाही असो तो आपल्या हुंड्यासाठी पाच बोटांची मूठ दाखविल्याशिवाय रहातच नाही. तो काही हुंडापद्धतीच्या पापपुण्याचा विचार करीत नाही. कित्येकांची तर इतकीही मजल गेलेली आढळते की ‘‘आम्ही आमची विक्री करितो, असे वाटेल तर म्हणा; पण हुंडा घेतल्याशिवाय सोडणार नाही.’’ मित्रहो असल्या शूर योद्ध्याबरोबर टक्कर मारणे फार धाडसाचे आहे. अर्थात कुमारिकांचे शापचसे काय परंतु प्रत्यक्ष रुद्राचा कोपानल जरी त्यांच्यावर कोसळू लागला तरी ते त्याची थोडी पर्वा करणार आहेत? ज्यांची विचारशक्ती मंद झालेली नाही, ज्यांच्या हृदयात काही विवेक शिल्लक आहे त्यांच्याच पुढे विचारांचे चार दाणे टाकल्यास सार्थ होईल; कोंबड्यांना रत्नाची पारख कोठून असणार?
हुंड्याचे मान दिवसेंदिवस वाढत्याच प्रमाणावर असल्यामुळे समाजात दारिद्र्याचेही मान तितक्याच प्रमाणात वाढलेले आहे. सांपत्तिक क्षीणतेमुळे इतर सर्व सद्गुणांची रोपडी ठिकच्याठिकाणी कोमेजून जात आहेत.
नवरे महाग झाले
म्हणून हजारो कुमारिका आपल्या भावी संसाराबद्दल निराश होऊन राहिल्या आहेत. आज महाराष्ट्रातील कित्येक नामांकित जातीत वीसवीस पंचवीस पंचवीस वर्षांच्या कुमारिका ब-याच आढळू लागल्या आहेत. सर्वच कुमारिकांना शिक्षणाचा लाभ होण्याइतके दिवस आम्ही अजून आणलेले नाहीत. नव-यांच्या महागाईमुळे अविवाहित स्थितीत राहणा-या शेकडा ९० कुमारिका अशिक्षित असतात; अर्थात अखंड कौमार्य पालन करण्याचे नैतिक धैर्य ऊर्फ संन्याशी बाणा सर्वांनाच साधता येत नाही. अशा परिस्थितीत निसर्गाच्या नियमांना ज्या ज्या कुमारिका नाइलाजामुळे बळी पडतात, त्यांची सर्व जबाबदारी या हुंडा घेणारांच्याच माथी नाही तर कोणाच्या? पुरुषांचा माथा नेहमीच उजळ असल्याबद्दलची सनद खुद्द ईश्वराकडून आजही मिळविली आहे. आमच्या स्वैर वर्तनाबद्दलचे माफीपत्र आमच्या जन्माबरोबरच आम्ही घेऊन येतो. तेव्हा निसर्गाच्या नियमांची आम्हाला असावी तितकी पर्वा असू नये किंवा वाटावी तितकी जाणीव वाटू नये यात काही आश्चर्य नाही. साठी उलटून गेल्यावरसुद्धा निर्लज्जपणाने दशवर्षा कुमारिकेचे पाणीग्रहण करणा-या एका पंडिताचार्याने ‘‘माझे स्वतःचे वर्तन शुद्ध रहावे म्हणून लोकापवादाचे तीक्ष्ण प्रहार सहन करूनही मी हा विवाह केला.’’ असे नाही का नुकतेच जाहीर उद्रार काढले? हे उद्गार एखाद्या विधवेला काढता आले असते काय? पण आचार्य पडले पुरुष. त्यांना निसर्गाचा नियम किंचित टोचू लागला मात्र, त्यांनी ताबडतोब आपल्या ईश्वरदत्त सनदेची मागणी अंमलात आणली. नीतिमत्तेची एवढी काळजी करणा-या आणि स्वतःचे वर्तन परीटघडीप्रमाणे रहावे म्हणून पाउणशे वयमानातसुद्धा कोवळ्या कुमारिकेशी लग्न लावणा-या या विद्वान् विद्वान पंडितांनासुद्धा जर स्वतः संन्यस्त वृत्तीने राहणे जड जाते, तर त्यांनीच मुग्ध अननुभवी कुमारिकांपासून यावज्जन्म संन्यस्थ वृत्तीची अपेक्षा करावी, हे आश्चर्य नव्हे काय?
निसर्गाचे नियम पुरुषांना मात्र लागू आणि स्त्रियांना नाही, असे थोडेच आहे? आजपर्यंत स्त्रियांच्या दुर्वर्तनाचा इतिहास पाहिला तर असे आढळून येते की जात्याच राक्षसी वृत्तीची काही अत्यंत अल्पसंख्याक उदाहरणे बाद करता,
स्त्रियांच्या दुर्वर्तनाला पुरुष कारण
झालेले आहेत. स्त्रीवर्ग हा जात्याच अत्यंत पापभीरू आहे. त्यातल्या त्यात आमच्या महाराष्ट्रीय ललनासमाज तर अत्यंत सात्विक आणि सद्वर्तनप्रिय असल्याची ग्वाही इतिहास देत आहे. आमच्या महाराष्ट्रीय कुमारिकांच्या इतक्या सहनशील आणि उदार मनाच्या कुमारिका इतरत्र लाभणे कठीण आहे. परंतु सहनशीलतेला आणि सद्वर्तनप्रियतेलाही काही मर्यादा असते. मनुष्य कितीही लॉ-अबाईंटिंग (कायदे पाळणारा) असला, त्याची राजनिष्ठा कितीही अभेद्य असली, तरी कायदेच जुलमांचा कळस करू लागले म्हणजे ती त्याची जिवापलीकडे जतन करून ठेवलेली निष्ठेची सात्विक तात तटकन् तुटण्यास काही अवधी लागत नाही, हे आता सगळ्यांच्याच प्रत्ययाला आलेले आहे आणि या सात्विक वृत्तीच्या भंगाबद्दल जर कोणी जबाबदार असेल तर ते जुलमी कायदेच होत, मनुष्य नव्हे. हुंड्याच्या राक्षसी प्रघाताने आमच्या कुमारिकांवर आजन्म
अविवाहितपणाची बळजबरी
झाल्यामुळे त्यांच्या नैसर्गिक शालीनतेने जर वेळी निसर्गाच्या नियमांपुढे कच खाल्ली आणि विवेक नको नको म्हणत असतानासुद्धा जर त्यांचे पाऊल वाकडे पडले, तर त्याबद्दल हुंडा दणारे घेणारे आणि त्याचा प्रसार करणारे सर्व लोकच जबाबदार धरले पाहिजेत. स्त्रियांकडून सद्वर्तनाची अपेक्षा करणारांनी एक तर स्वतः सद्वर्तनी राहिले पाहिजे आणि सामाजिक किंवा धार्मिक रूढींच्या जुलमांनी स्त्रीवर्गाच्या सहनशीलतेचा आणि नैसर्गिक सद्वर्तनी वृत्तीचा अंत पाहता कामा नये. या बाबतीत पुरुषवर्ग जसजशी बेपर्वाई दाखवीत जाईल, तसतशी विनयाची पायमल्ली करून पुरुषांप्रमाणेच उघड मात्याची प्रवृत्ती स्त्रियांत नाइलाजामुळे प्रचलित होम्याची फार धास्ती आहे, आणि असा प्रसंग हिंदू समाजावर ओढवू पहात आहे, याची स्पष्ट चिन्हे आजच दिसू लागली आहेत, ही गोष्ट नाकबूल करून भागावयाचे नाही. धार्मिक किंवा सामाजिक रूढींच्या जुलमी कैचीत घट्ट पकडून निसर्गाचे अनुल्लंघनीय नियम मोडण्याची बळजबरी आज आम्ही कित्येक वर्षे स्त्रीवर्गावर करण्यात चटावलो आहोत. या भयंक्र पातकाची भयंकर अशी प्रतिक्रिया होण्याची सुरुवात कधीच झाली आहे; फक्त त्याबद्दलचे अज्ञानाचे ढोंग दाखविण्याकरिता आम्ही मुद्दाम डोळ्यांवर कातडे ओढून बसलो आहोत. हा प्रश्नच इतका नाजूक आहे की त्यावर उघड उघड चर्चा करायला कोणी धजत नाही. परंतु आमची सद्यःस्थिती पाहिली तर आता
दुखणे चव्हाट्यावर बांधण्याची वेळ
येऊन धडकली आहे. शब्दपांडित्य करून किंवा वकिली शैलीची विवेचनपद्धती स्वीकारून उन्नतीच्या आणि जागृतीच्या खोट्या गप्पा मारणारे खुशाल आपल्या विवेकबुद्धीला ठकवोत; परिस्थिती बदलण्याचे कार्य मात्र करण्यास ते नालायक आहेत एवढेच त्यावरून सिद्ध होत आहे. मित्रहो, किंचित् आडपडदा पाजूला सारून स्पष्ट सांगतो की आजकाल जन्मताच मारून रस्त्यावर टाकलेल्या भ्रूणहत्येचा इतिहास पहा. त्यातली शेकडा ८० मुले पांढरपेशा जातीतलीच असावी असा तर्क सिद्ध होऊ पहात आहे. अमुक एका विवक्षित जातीत कुमारिकांच्या किंवा विधवांच्या भ्रूणहत्येची उदाहरणे घडतच नाहीत. असे छातीठोक विधान कोणालाही करता येणे शक्य नाही. आजपर्यंत भ्रूणहत्येच्या दोषांत विधवांना जबाबदार धरण्यात येत होते, आता त्यात अविवाहित कुमारिकासुद्धा आस्ते आस्ते प्रवेश करू लागल्या आहेत; आणि या घोर अनर्थाला
पुरुषवर्गच जबाबदार आहे
सर्व गोष्टी स्पष्ट दिसत असताही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हे समाजाच्या कुजक्या नासक्या स्थितीचे चिन्ह आहे. असल्या समाजाच्या हातून राष्ट्रसेवा काय घडणार याचे गणित सोडवायला रँग्लरचीच परीक्षा द्यायला नको. शिक्षणाच्या अभावामुळे म्हणा, प्रभावामुळे म्हणा किंवा निसर्गाची प्रवृत्ती विवेकाच्या शृंखला तोडण्याइतकी बेफाम झाल्यामुळे म्हणा, कित्येक अविवाहित प्रौढ कुमारिका नाइलाजाने वाकड्या मार्गात पाऊल टाकतात आणि ज्यांना विवेकाच्या अंकुशाने निसर्ग प्रवृत्तीचा मस्त हत्ती निश्चयाच्या एकाच फटक्याने जागच्या जागी तीच करता येतो अशा कित्येक कुमारिका देवी स्नेहलतेप्रमाणे स्वतःस पेटवून घेऊन स्वतःला व बापाला सामाजिक जुलमांच्या काचातून कायमचे मुक्त करण्यासाठी
धिःकार असो या हिंदू समाजाला
असे तळतळाटाचे शाप देत अकाली मृत्यूला कवटाळ्यास प्रवृत्त होतात. या गोष्टी वर्तमानपत्रात चटणीसारख्या कधीमधीच प्रसिद्ध होत असल्या तरी त्यांचा प्रसार आजकाल ब-याच विस्तृत प्रमाणात निरनिराळ्या पद्धतीने होत आहे.
हुंड्याच्या जुलमी प्रघाताने आपल्या जीवितसर्वस्वाचा आणि जीवनहेतूंचा घात केला आहे, ही जाणीव होताच निराशेने आत्मघात करण्यास साहजिकच प्रवृत्त होणा-या असंख्य कुमारिका स्नेहलतेप्रमाणे स्वतःस जरी प्रत्यक्ष जाळून घेत नसल्या तरी इतर अनेक साध्य साधनांनी स्वतःचा मृत्यू आपणाकडे त्वरित ओढून आणण्यास मागे पुढे पहात नाहीत. स्नहेलतेसारखी मोठ्या धाडसाची उदाहरणे घडली की वर्तमानपत्रांतून त्यांचा पुकारा होत, ठिकठिकाणी
सरड्यांची चळवळ
आणि चहादाणीतली वदळे उत्पन्न होतात; परंतु इतर शांत व अज्ञात मार्गांनी आत्महत्या करणा-या कुमारिकांची उदाहरणे वर्तमानपत्री चित्रगुप्तांच्या नेत्रकटाक्षाच्य ामर्यादेबाहेर असल्यामुळे त्यांचा फारसा गवगवा होत नाही. या दृष्टीने विचार केला तर स्नेहलता एकटी कलकत्त्यातच नसून हिंदुसमाजातील प्रत्येक घरात निदान एकतरी स्नेहलता सापडल्याशिवाय रहाणार नाही. हुंडे उकळणारांची स्वार्थी हैवान दृष्टी मोहरांच्या आणि रुपयांच्या वर्तुळ मर्यादेच्या बाहेर जात नसल्यामुळे, किंवा ती न जावी असा त्यांनी आगाऊच बंदोबस्त केल्यामुळे, लग्नसराईच्या प्रत्यक्ष धामधुमीत त्या मोहरारुपयांच्या खाली लाखो
कुमारिकांच्या आत्महत्येची राख
धमधमत असलेली त्यांना दिसत नाही व भासतही नाही. परंतु लग्नसराईची बंडाळी थांबल्यावरसुद्धा ही राख जरी कोणी स्पष्टवक्त्याने त्यांच्या डोळ्यात फेकून चरचरीत अंजन घातले, तरी दुस-या लग्नसराईचा हंगाम येताच ही स्वारी हुंड्याच्या पिशाच्चापुढे
घालीन लोटांगण वंदीन चरण
करीत बसलेलीच आढळते. या हुंडा भैरोबाचे भगत निवळ जुन्या मतवाल्यांतीलच असतात असे नाही. हुंड्याच्या बाबतीत जुन्या लोकांची टाळकी सणसणीत सडकली गेलेली असल्यामुळे त्यांनी आस्तिपक्ष किंवा नास्तिपक्ष काहीच न पत्करता वारा वाहील तशी पाठ देण्याचे ठरविले आहे. हुंड्याचे देव्हारे माजविणारे आमचे एज्युकेटेड लोकच फार आहेत. त्यांच्या भैरोबाने आजपर्यंत लाखो कुमारिकांचा बळी घेतला, हे ते भगत लोक उघड्या डोळ्यांनी पहात असताही त्यांनी हुंड्याच्या यज्ञाला अधिकाधिक प्रज्वलित करण्याचा धूमधडाका चालविला आहे. फार काय सांगावे? एकच ठळक उदाहरण देतो, नाव मात्र सांगत नाही. मोठमोठ्या संस्कृत ग्रंथाच्या प्रचंड ज्ञानोदधीत यथेच्छ विहार करून, त्यातील अगदी खोलखोलची निवडक निवडक तत्त्वरत्ने बाहेर काढणारे आणि अबलांच्या उन्नतीवर पांडित्य झोडणारे एका आंग्लविद्याविभूषित महामहोपाध्याय स्वतःच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी हुंड्याच्या बाबतीत इतके बेफाम बनले होते की हजाराच्या प्रमाणावर आपल्या उड्यांचे प्रमाण ठरवून स्वारी जी निघाली ती दहा हजाराच्या स्टेशनावर जाऊन धडकली. पुढेही उडी मारण्याचा विचार होता. परंतु डोळे उघडून पहातात तो हुंड्याच्या सट्ट्यात वचनभंगाचे पातक नकळत घडल्यामुळे
सॉलिसिटराच्या नोटीशीचा डेंजर सिग्नल
त्यांच्या खाडकन नजरेस पडला! या स्वारीने नंतर काही दिवस वेड लागल्याचे सोंग आणले होते. हल्ली यांची प्रकृती बरी असून ते आत्मानात्मविचारात आयुष्याचा सदुपयोग करीत असतात. मोठमोठ्या शहाण्यासुरत्या विद्वानांची ही दशा मग नुसती पुस्तके घोकून डिग्र्या मिळविलेल्या तरुण पंडितांची ती काय कथा? बिचा-या सटरफटर परीक्षावाल्यांची तर गोष्टच राहू द्या. ज्यांनी स्वतः आपल्या उपदेशाप्रमाणे आचरणाचे प्रत्यक्ष धडे लोकांना घालून द्यायचे, तेच जर दुटप्पी वर्तन करू लागले, तर समाजसुधारणा ती काय होणार आणि उन्नती तरी काय रडणार, सांगा बरे? आमच्यातील श्रेष्ठ म्हणविणा-या मंडळीनीच या हुंडाराक्षसाची अपेक्षा करावी, मग त्याने इतरांच्या मानगुटीवर बसून कुमारिकांचे बळी घेण्याचा धंदा अप्रतिहत का चालवू नये? आमच्यातील सुशिक्षित तरुणांनाच जर वेळी द्रव्याच्या आयत्या लाभाला बळी पडण्याचा मोह उत्पन्न होतो. तर त्या त्यांच्या हैवान आणि नामर्द वृत्तीचा फायदा कुमारिकांचे रक्त पिण्यास सोकावलेल्या हुंड्यासारख्या राक्षसाने का घेऊ नये? आम्ही हुंडा का घेतो याचे समर्थन करणारी अनेक विधाने हुंडा हबकण्यास लालचावलेल्या स्वार्थी मंडळींनी शोधून काढलेली आहेत. त्या सर्वांना उत्तरे देणे मुळीच कठीण नाही, परंतु तसे करण्यात व्यर्थ कालक्षेप करणेही चांगले नाही.
त्या सर्व विधानांचा जर काही निष्कर्ष काढता येईल तर एवढाच की त्यांना
स्वार्थी जी प्रीति मनुजाची सहज
असते, तिला ढका लावण्याची इच्छा नसते. रूढीच्या प्रघाताने आयताच स्वार्थ साधत असल्यावर स्वार्थत्यागाचा कटु उपदेश कोण कसा जुमानणार? आम्ही आजपर्यंत आमच्या मुलींना (‘मुलींना हुंडा देणे’ ही शब्दरचना मोठी फसवणूक करणारी आहे. मुलींना वास्तविक कोणीच हुंडे देत नसतो. तो देतात त्यांच्या नव-यांना. पण भाषासरणीतसुद्धा विपर्यास घुसून बिचा-या कुमारिकांना नसत्या आरोपात आणतो!) हुंडे देत आलो, आता मुलांच्या लग्नाच्या वेळी का घेऊ नये? हे विधान अगदी सरळ आहे आणि ते प्रामाणिक दिसते. परंतु ही विचारसरणी दुर्दैवाने विवाहसंस्काराशी निगडित झालेला असल्यामुळे त्या प्रामाणिकपणाच्या दुधात दुष्टाव्याचे पाणी पडते आणि विधानाच्या सरळपणाचीही नाइलाजाने चिळत उत्पन्न होते. हाच जर उघड उघड एखादा व्यापाराचा प्रश्न असता तर त्यावर आक्षेप घेणाराच मूर्ख ठरला असता. अज्ञानाने, नाइलाजाने किंवा रूढीच्या तडाख्यात सापडल्याने द्याव्या लागलेल्या हुंड्यांच्या खंडणीची परतवसुली तिस-याच एकाची गर्दन मारून करणे, म्हणजे स्वतःच्या घरच्या दरोड्याची नुकसानभरपाई रामभटाचे झोपडे लुटून करण्याइतकीच सरळ आणि प्रामाणिक होय. मुलामुलींची लग्ने हा एक सट्ट्याचा बाजार बनला आहे असे जे मी म्हणतो त्याला ही असली विधाने सबळ पुरावाच आणीत आहेत. अर्थात् ह्या विधानांची तिरस्कारापेक्षा अधिक संभावना करणेच योग्य नव्हे.
हुंड्याची पद्धत नष्ट व्हावी म्हणून आजपर्यंत शेकडो यज्ञ झाले आणि हजारो उपायही अमलात आणून पाहिले;
परंतु गुण काही येत नाही.
उलट जो जो म्हणून काही उपाय सुचवावा किंवा प्रयत्न करावा, त्याची टवाळीच करण्याकडे लोकांची प्रवृत्ती होत जावी, हे चिन्ह निःसंशय आमच्या गंजलेल्या मनोवृत्तीचे द्योतक आहे. शपथा घेण्याचे फार्स झाले, ठराव पास करण्याची नाटके झाली, हुंड्याचे भीषण स्वरूप चव्हाट्यावर मांडणारी प्रत्यक्ष नाटके झाली, कादंब-याही निघाल्या, परंतु हा हुंडाराक्षस किंवा त्याची राक्षस भगतमंडळी यांपैकी कोणीही हार खात नाहीत. वधूंच्या लग्नवयाची मर्यादा वाढविली, वरांच्या शिक्षणाची वृद्धि केली, तरीसुद्धा काही नाही. वधूंच्या वयोमर्यादेच्या जोडीनेच हुंड्याचे मान वाढू लागले आणि वरांच्या वाढत्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या हुंड्याचा हट्ही वाढू लागला. थोडक्यात सांगायचे म्हणजे या दुष्ट चालीला प्रतिबंध करायला म्हणून जो जो उपाय करावा तो तो अपायच होत आहे; आणि याचे एक मुख्य कारण हेच आहे की आमच्या समाजात अजून ख-या माणुसकीचा उदय व्हावयाचा आहे. म्हणजे विवाहविषयक मूळ ख-या उद्दिष्टाचा जेव्हा आम्हा शहाण्यासुर्त्यांच्या समजुतीत नीट प्रकाश पडेल, विवाहसंस्काराच्या मूळ शुद्ध हेतूंची कल्पना जेव्हा आमच्या विवेकचक्राच्या आटोक्यात येईल, लग्नांवर चढलेले व्यापारी दृष्टीचे कवच जेव्हा आपल्याच भाराने कोसळून खाली पडेल आणि विवाहसंस्काराच्या आध्यात्मिक जबाबदारीची खरी जाणीव जेव्हा आमच्यात उत्पन्न होईल, तेव्हाच हा
हुंडाराक्षस गतीला जाईल.
तात्पर्य, ‘‘खरा, नित्य व टिकाऊ उपाय म्हटला म्हणजे लग्न हा शुद्ध धार्मिक विधी आहे; त्याला उभयपक्षी हौसेची आणि मोकळ्या मनाची कबुली लागते; आणि देण्याघेण्याच्या करारांनी त्या विधीच्या शुद्धतेस कमीपणा येतो, अशी धार्मिक दृष्टीच प्रचलित झाली पाहिजे. अथवा धार्मिक बुद्धीपेक्षा व्यावहारिक सारासार विचार हाच कित्येकांस अधिक पटेल; पण त्यांना झाले तरी मुलामुलींचे लग्न करणे म्हणजे एक नवीन घर जोडणे, नवीन स्नेह व ऋणानुबंध संपादन करणे, आणि स्वतःच्या व भावी पिढीच्या कौटुंबिक सुखाच्या नवीन नवीन इमारतींचे पाये भरणे होय, अशी बुद्धी उपजत गुणाने तरी जन्मली पाहिजे किंवा शिक्षणामुळे आली पाहिजे.’’ असे जे उद्गार केसरीकाराने ‘हुंड्यावर बहिष्कार’ या निबंधाच्या अखेरीस काढले आहेत, तेच मी विचारवंतांपुढे विचारार्थ मांडतो.
सन १९१४ साली कलकत्त्यास स्नेहलता कुमारीने अंगावरील वस्त्रांस पेटवून आपणास जाळून घेतल्याच्या तारा वर्तमानपत्रांत फडकताच एकदम आसेतुहिमाचल सर्व हुंडेवाल्या समाजात – विशेषतः तरुण सुशिक्षित विद्यार्थ्यांत मोठी खळबळ उडाली आणि त्यांनी हुंड्याविरुद्ध मोठ्या जोराची चळवळही सुरू केली. बंगाल्याप्रमाणेच महाराष्ट्रातील कॉलेजातही ही स्नेहलतेची चळवळ इतक्या जोसात सुरू झालीकी सुमारे एक महिनाभर क्रमिक विषयांचा अभ्यास सांदीला पडून सर्व विद्यार्थ्यांच्या तोंडातून अष्टौप्रहर स्नेहलतेशिवाय शब्द निघेनासा झाला. मोठमोठ्या सभा भरू लागल्या. तरुण विद्यार्थ्यांची हुंडानिषेधक
मोठ्या तडफीची व्याख्याने
धडाधड होऊ लागली. हुंडा न घेणाच्या शपथपत्रिका छापून त्यावर ईश्वराला साक्ष ठेवून सह्या देण्याकरिता हजारा विद्यार्थी-वीर पुढे सरसावले. स्नेहलतेच्या चरित्राचा पाठ सुरू झाला. ती जिवंत असताना खुद्द तिला मागणी घालण्याचे जरी एकाही तरुणाने श्रेय घेतले नाही, तरी तिने हुंड्याच्या यज्ञात आली आहुति देताच तिच्या फोटोला तर न भूतो न भविष्यति मागणी पडली. तिच्या चारित्र्याचे रहस्य काढण्यात अनेकांनी आपली लेखनशक्ती व कवित्वशक्ती खर्ची घातली. स्नेहलतेच्या नावाने गावोगाव व्याख्यानमाला गुंफल्या जाऊ लागल्या. कलकत्त्यांत तिच्या स्मारकाचा पुकारा होताच, तिच्या संगमरवरी पुतळ्याच्या खर्चाकरिता महाराष्ट्रीय तरुण विद्यार्थ्याकडून धडाधड रकमांवर रकमा पोष्टाच्या थैल्यांतून उड्या घेत स्मारकफंडाच्या गंगाजळीत जाऊन पडल्या. कित्येकांच्या छातीवर थपथेच्या किती आणि स्नेहलतेची लॉकेटे झळकू लागली. वर्तमानपत्रांत तर हुंडानिषेधक लेखांचा आणि पत्रांचा इतका तोबा उडाला की त्याने हुंड्याची
हाडें न् हाडें सडकून काढली.
जी गोष्ट अनेक वर्षांच्या सौम्य कडक उपदेशांनी अगर व्याख्याने, नाटके, कादंब-यांनी साध्य झाली नाही, ती गोष्ट स्नेहलतेने आपल्या आत्महत्येने चुटकीसरशी घडवून आणली म्हणून तिच्या स्वार्थ त्यागाला तर आणखी एक विशेष महत्त्व आले आणि तरुणांच्या त्यावेळच्या एकंदर उत्साहावरून आणि निश्चयावरून असे पुष्कळांनी अनुमान काढले की आता महाराष्ट्रांतून या
हुंड्याचे कायमचे उच्चाटन
होणार, तरुणांनी एखादे कार्य हाती घेतले म्हणजे ते त्याचा पिच्छा पुरविल्याशिवाय सोडणार नाहीत, असे निदान बंगालच्या रद्द झालेल्या फाळणीच्या इतिहासाने प्रचितीस आणले होते; आणि महाराष्ट्रातील तरुण विद्यार्थी हे सुद्धा
एकाच आल्मा मेटरचे दूध
पिणारे असल्यामुळे बंगाल्यांची निश्चयी तडफ आमच्याइकडेही तशीच-किंबहुना अधिक चिकाटीची-दृष्टीस पडेल अशी फार फार अपेक्षा होती. परंतु......!!! आम्हा महाराष्ट्रीयांच्या पाठीशी कितीही बलवत्तर असा प्राचीन संस्कृतीचा पाठिंबा असला आणि एकवेळ साम्राज्य गाजविल्याची स्मृती आमच्या स्मरणात जरी अगदी गरमगरम ताजी असली तरी सक्रिय (practical) बनण्यापेक्षा भावनावश (sentimental) बनण्याची जी एक वृत्ती अलिकडे आमच्या अंगी खिळली आहे, ती आपला प्रभाव गाजविल्याशिवाय कशी राहील? आम्ही शपथा वाहिल्या, लेक्चरे झोडली, प्रोटेस्ट केला, रेझोल्यूशन पास केले, मेमोरिअलचा पुरस्कार केला, सर्व काही केले; पण लगेच दुसरी लग्नसराई येताच हाडे ठेचून निर्जीव केलेला
हुंड्याचा समंद
पुन्हा जिवंत होऊन आमच्या बोकांडी बसायचा तो बसलाच. गेल्या चार वर्षांत या स्नेहलतेच्या कित्येक शपथवाल्यांनी ईश्वराला साक्ष ठेवून वाहिलेल्या शपथांना आपल्या बापाच्या-मामाच्या-काकाच्या किंवा कोणाच्या तरी तोंडाकडे पाहून धिःकार केल्याची उदाहरणे, कोणी रिकामटेकडा त्यांची सेन्सस घ्यायला निघेल तर, शेकडो सापडतील. ‘स्नेहलतेच्या मूठभर चितेने तापलेले’ या वचनभ्रष्ट तरुणांच्या ‘वैराग्याचे भांडे’ स्नेहलतेच्या चळवळीचा हंगाम जाता पूर्वीप्रमाणेच थंडगार पडले आणि स्वतःच्या लग्नाचीवेळ येताच त्यांनी आपल्या वधूच्या पित्याला किंवा पालकाला
हुंड्याच्या चरकात पिळून
काढायला मुळीच मागेपुढे पाहिले नाही. स्वार्थासाठी वचनभंगही करायला निर्ढावलेल्या तरुणांचा नुसता शाब्दिक निषेध करून भागण्याचे हे दिवस नाहीत. त्यांच्याबद्दल नुसती कीव दाखवूनही समाजाचा संसार चालावयाचा नाही. त्यांच्या उच्चशिक्षणाच्या किंवा टोपलीभर डिप्लोम्यांच्या मध्यस्तीवर फाजील भरवसा टाकून, त्यांच्या वचनभ्रष्टतेकडे कानाडोळा करून चालायचे नाही.
सामाजिक साम्राज्यात वचनभंग करणारे लोक राष्ट्रीय संसाराच्या साम्राज्यातही तेच पातक करण्यास मागेपुढे पहाणार नाहीत. ज्यांना आपल्या स्वतःच्या शपथा पाळण्याइतका मनोनिग्रह आणि सत्याची चाड नाही, त्यांच्या हातून समाजाचे किंवा राष्ट्राचे काय कल्याण होणार ते सांगायला नकोच. स्नेहलतेने हुंड्याच्या यज्ञात आपला बळी दिल्याचे हृदयविदारक वर्तमान ऐकून ज्यांनी
‘मी हुंडा घेणार नाही’
अशी विश्वदेवतांच्या समक्ष आपल्या अंतस्थ आत्मारामाला साक्ष ठेवू शपथ घेतली होती, व ज्यांनी नाना प्रकारच्या विलायती सबबीच्या पांघरुणाखाली आपल्या लग्नाच्या वेळी त्या शपथा अज्जिबात विसरून जाऊन,
हैवान मृतधनाचे हुंड्याचे हंडे
बकाबक गिळले, त्यांना आपण असे नको का विचारायला की तुम्ही शपथ विसरता ती विसरलात, पण स्नेहलतेच्या साडीने पेट घेतल्यावर तिच्या अंगावर त्यावेळी टरारून उठलेले फोड तुम्हाला बुंदीच्या लाडवांवर उमटलेले दिसले नाहीत काय? बाह्य देहाचे भस्म झाल्यावर स्नेहलतेच्या निष्पाप स्वार्थत्यागी पोटातून धडाधड बाहेर कोसळणारी तिची आतडी लग्नाच्या मेडवान्या झोडताना तुम्हाला जिलब्यांच्या वेटाळ्यांत दिसली नाहीत काय? तुमच्या ताटापुढे निरनिराळ्या नक्षीच्या काढलेल्या कण्यारांगोळ्या पाहताच स्नेहलतेच्या सुकुमार देहाची झालेली राखरांगोळी तुमच्या स्मरणात आलीच नाही काय? मृण्मय देहाचा नैवेद्य अग्नीने डोळ्यांसमक्ष फस्त केलेला पाहून स्नेहलतेच्या सूक्ष्मदेहाने या मृत्यूलोकाची शेवटची-कायमची रजा घेताना-फोडलेल्या कर्कश किंकाळीने ताशे वाजंत्र्यांच्या कडकडाटाचा कटाह फोडून तुमच्या कानांत तुमच्या शपथेची आठवण करून दिली नाही का? ‘मी तर आता मरतेच पण माझ्या उदाहरणाने तरुण पुरुष यापुढे तरी हुंड्याच्या रक्ताने आपले हात न माखवोत’ असा त्या
अर्वाचीन देवेचा मृत्यू-संदेश
तुमच्या वधूच्या पाणीग्रहणसमयी तुमच्या स्वतःच्या हातांकडे तुमची अभ्रष्ट नजर जाती तर खात्रीने आठवला असता, आणि तुम्ही आपला पतित हात त्याचवेळी छाटून तरी टाकला असता किंवा त्यावर बरबटलेले हुंड्याचे कुष्टप्राय रक्त प्रथम साफ धुवून नंतरच आपल्या वधुदेवतेच्या हातात हात घातला असतात. माझ्या प्रियकर सुशिक्षित मित्रांनो, आत्मयज्ञात अलौकिक शौर्याने आपल्या देहाची आहुति देण्यापूर्वी, देवी कुमारी स्नेहलतेने आल्या बापाला लिहिलेले पत्र आपण कसे विसरलात? पाषाणासही पाझर फोडणारा त्यातील हृदयद्रावक शब्दसमूह तुमच्या हृदयातून इतक्यातच कसा नष्ट झाला? मित्रांनो, पहा मी पुन्हा वाचतो ते
दिव्य स्नेहलतेचे दिव्य पत्र
बाबा, माझ्या लग्नाकरिता आपले वडिलोपार्जित घर गहाण टाकू नका. या घरात परके लोक येऊन राहिलेले मला पहावणार नाही; तुम्हांस खरोखर घर गहाण टाकण्याची गरजच आता उरणार नाही. कारण उद्यांचा दिवस उजाडण्याच्या आतच ही तुमची दुर्दैवी मुलगी परलोकी जाईल; तुम्ही व आईने प्रेमाचे जीवन घालून ही ‘स्नेहलता’ वाढविलीत व आपल्या हृदयाभोवती बिलगू दिलीत; राजवाड्यातील राजकन्येपेक्षाही मला येथे अधिक सुख लागले. आपल्या वडिलार्जित घरातून तुमची व माझ्या भावंडांची हकालपट्टी व्हावी आणि तुम्हा सर्वांनी दारिद्र्यात व दैन्यात दिवस कंठावे, अशी का आपल्या प्रेमाची फेड मी करावी? बाबा, पहाटेपासून शहरभर हिंडून थकून भागून तुम्ही दुपारी घरी परत आलात, व दुःखाने ‘काम फसले’ असे म्हणालात, त्या वेळची तुमची मुद्रा माझे डोळ्यांपुढे अजून दिसते आहे, व तुमचे शब्द अजून कानांत घुमत आहेत. माझे लग्न कसे होणार याची चिंता तुमचे मनाला सारखी जाळीत आहे. १५ वर्षांपर्यंत माझे लग्न झाले नाही, याबद्दल लोकही तुम्हांस नावे ठेवीत; म्हणून वर पहाण्याचा तुम्ही फार प्रयत्न केला. खरोखर लग्नाची मला स्वतःला कसली हौस असणार? तुमच्या मनातली काळजी दूर व्हावी एवढ्याच हेतूने आपले लग्न व्हावे असे मला वाटे; पण नाही, तसे घडणे अशक्य दिसते.
रात्री दुर्गामाईने माझे स्वप्नात येऊन मला आपणाकडे बोलाविले. तेव्हा मला बाबा तुमची, आईची व लहान भावंडांची आठवण झाली; पण तुम्हां सर्वांस माझ्या लग्नामुळे दुःख व विपत्ती भोगावी लागू नये म्हणून मी दुर्गामाईकडे जाण्याचा निश्चय केला.
संसारयात्रा संपविण्याकरिता अग्नि, पाणी, विष यांपैकी कोणाचा आश्रय करावा याचा मी बराच विचारकेला, व अखेर अग्नीचा आश्रय करण्याचा निश्चय केला. आता लवकरच मी जी आपल्या अंगास आग लावून घेईन, तीमुळे देशांतील सर्वांची अंतःकरणे वितळून त्यांत दयेचा पाझर फुटो, एवढेच देवाजवळ मागणे आहे. मी मेल्यावर बाबा, तुम्ही सर्व अश्रु ढाळाल. पण मी गेले तरी आपले घर तुम्हांस व माझ्या भावंडांस राहील. बाबा याहून जास्त लिहवत नाही. आता पहाट संपत आली आहे व आत्मयज्ञाची वेळ जवळ येत चालली आहे; पुनः कधीही जागेपण येणार नाही. अशी महानिद्रा मी आता घेणार? दुर्गामाईच्या सन्निध लवकरच जाऊन मी तुमची व आईची चातकाप्रमाणे मार्गप्रतीक्षा करीत बसते.
आपली, दुर्दैवी मुलगी
स्नेहलता
अहाहा! हा मृत्युलेख म्हणजे शुद्ध कुमारीच्या शुद्ध अंतःकरणातील शुद्ध विचारलहरींनी खळबळलेला महासागर आहे! त्याने तुमचीच तेवढी हृदये भिजविली नाहीत काय? परंतु तुम्हाला तरी काय म्हणून दोष द्यावा? कित्येक वर्षांच्या प्रघाताने हुंड्याचे जालीम विष आमच्या रक्तात अगदी भिनून गेल्यामुळे नुसत्या
उपरतीचा सार्सांपरिला
आम्ही कितीही ढोसला तरी त्यापासून काय फायदा? प्रकृती सुधारण्याला प्रथम कुपथ्याची हकालपट्टी व्हावी लागते. ती जोपर्यंत आम्ही करणार नाही, तोपर्यंत रोगही हटणार नाही.
हुंड्याने आमच्या समाजाला कीड लागली आहे, हुंडा हे धार्मिक, नैतिक किंवा व्यावहारिक दृष्ट्या पाप आहे आणि हे पाप समाजातून लवकर नष्ट होईल तर बरे, या गोष्टी हुंडे घेणारे लोकसुद्धा कबूल करतात. या बाबतीत योग्य ते उपाय करून या हुंड्याला जिवंत गाडण्याच्या कामी पुरुषांनी आपली नालायकी सिद्ध करून घेतलीच आहे. तेव्हा त्यांना विनंती करण्याची ही वेळही नव्हे आणि त्यांच्या आर्जवापासून काही निष्पत्तीही व्हावयाची नाही. आता शेवटचा एकच उपाय राहिला आहे.
कुमारिकाच निश्चय करतील
तर
त्या हुंडा-दैत्याचे मर्दन करतील.
भगिनींनो, माझा तुमच्या निश्चयावर फार विश्वास आहे. तुमच्या सात्विक मनोवृत्तीचा मला अत्यंत आदर आहे. तुमची सहनशीलता तर लोकोत्तर आहे. तुमचा ध्येयाच्या भक्तीपूर्ण चिकाटीचा महिमा हाच आमच्या महाराष्ट्रीय इतिहासाचा खरा पाया आहे. पुरुषांनी समाजसुधारणेच्या गप्पा आजवर रगड मारल्या. आता हा तुमचाच मान तुम्हीच नीट पार पाडून दाखवा. मानवी समाजात तुमचा दर्जा फार उच्च आहे. तुमची योग्यता तर ऐतिहासिक आहे. मोठमोठ्या सम्राटांच्या व शककर्त्यांच्या माता होण्याचा अग्रमान तुमचाच आहे. राष्ट्रीय उत्क्रांत्यवस्थेच्या तुम्ही देवता आहात. सामाजिक सौख्याची सर्व सूत्रे तुमच्याच हाती असतात. समाज नियमन करणे हे मुख्यत्वेकरून तुमच्याच स्वाधीन आहे. समाजात
पुण्यप्रभावाचा पाऊस
पाडून दुर्वर्तनाचा कचरा साफ धुवून टाकण्यासाठीच तुमचा अवतार झालेला असतो. गृहव्यवस्थेप्रमाणेच समाजव्यवस्थेची गुरूकिल्ली जन्मसिद्ध तुमच्याच हाती असते. समाज क्षेत्रांत काय किंवा राष्ट्रीय क्षेत्रांत काय पुरुषांच्या इतकेच समसमान हक्क तुम्हा स्त्रियांना आहेत, ही गोष्ट विसरू नका. अर्थात् पुरुषवर्ग जर यापैकी कोणत्याही क्षेत्रांत तुमच्याविरुद्ध दांडगाई करू लागेल किंवा तुमच्या हक्कांची पायमल्ली करण्याकरिता जुलमी रीतीने वागू लागेल तर त्याचा प्रतिकार करून त्याला ताळ्यावर आणण्याची कामगिरी सहजच तुमच्याकडे येत आहे. बिकट परिस्थितीचे अभेद्य पर्वत निश्चयाच्या नुसत्या मुसंडीने चक्काचूर करण्यात स्त्रीजाती किती निष्णात असते हे जिजाबाईने आणि अहल्याबाईने सिद्धच केले आहे. तुमच्यासारख्या देवतांना या हुंडारूपी महिषासुराचे मर्दन करावयास मुळीच जड जाणार नाही, अशी माझी खात्री आहे. हृदयात त्वेषाचा जोर होऊन तुमच्या वक्र भृकुटीवर निश्चयाचे निशाण फडकू द्या मात्र, गेली ५-६० वर्षे मोठमोठ्या धनुर्धरांची हबेलंडी उडविणारा हा हुंडा राक्षस ठिकच्या ठिकाणी मरून पडेल. मी कादंबरीची भाषा बोलत नसून ख-या इतिहासाची भाषा बोलत आहे.
समाजाच्या सुव्यवस्थेसाठी ‘विवाह’ ही संस्था जर आवश्यक आहे तर तिची आवश्यकता स्त्री आणि पुरुष या दोघांनाही सारखीच असली पाहिजे. वधू आणि वर ही विवाहाची दोन सारख्याच महत्त्वाची अंगे आहेत; किंवा अगदी घरगुती भाषेत बोलायचे तर संसार-रथाची ही दोन समान चक्रे आहेत. विवाह होण्यास अथवा संसाराचा गाडा चालण्यास या दोघांची आवश्यकता अगदी समसमानच आहे. अर्थात वराने मात्र तटस्थ राहून वधुनेच आपणाकडे लग्नासाठी चालत आले पाहिजे, असा आग्रह धरणे न्याय्य तर होणारच नाही; पण तसला आग्रह करणाराला कोणीही वेडगळातच काढील. असला आग्रह धडधडीत सृष्टीनियमाविरुद्ध आहे आणि समाजक्षेत्रातील पुरुषवर्गाच्या अप्रतिहत वर्चस्वामुळेच त्याचा प्रसार फार झालेला आहे. स्त्रीवर्गात शिक्षणाचा प्रसार कमी, हक्काची जाणीव कमी आणि कुमारिकांच्या लग्नाच्या वयमर्यादेची कायमची आखणी यामुळे या फाजील आग्रहाने आजपर्यंत आपल्या‘’
जिवाची दिवाळी करून घेतली
वधुवरास विवाहाची आवश्यकता सारखीच असता, सामाजिक रूढीने फक्त वधूसच वयाची अट घातल्यामुळे, वरपक्ष बेफिकीर झाला आणि त्याचे निर्रथक स्तोम माजून धर्मनिषिद्ध, शास्त्रनिषिद्ध, सारासार विचारनिषिद्ध अशा अनेक घातक चालींचा आणि रूंढींचा विवाहविधीत समावेश झाला आणि वधुपक्ष नाना प्रकारच्या गैरसोयीखाली व आपत्तीखाली पार चिरडून गेला. आता, वधुपक्षाने आपल्या नरड्याला लागलेली हुंड्याची तात तोडण्याकरिता मुलींच्या लग्नवयाची मर्यादा दूर झुगारून दिली पाहिजे आणि पूर्वीच्या धर्मशास्त्राज्ञेप्रमाणे वराकडून मुलीला मागणे येईल तेव्हाच तिचे लग्न करायचे; एरवी आपण होऊन धडधडीत शास्त्राच्या हेतुविरुद्ध वराच्या शोधाकरिता मुळीत तंगडतोड करायची नाही, असा कायमचा संकल्प केला पाहिजे.
वराकडून मागणी आल्यावाचून माझ्या
मुलीचे लग्न मला कर्तव्य नाही
असा दृढ संकल्प मुलीच्या बापांनी केल्याशिवाय हुंड्याचा प्रघात मोडणे शक्य नाही. वधुच्या वयोमर्यादेच्या मनुष्यकृत आणि स्वार्थपाचित नियमापुढे मेंढराप्रमाणे मान न वाकविता मुली आपल्या बापांच्या घरी अविवाहित राहिल्या तर त्यात काही विशेष बिघडणार नाही. काय सध्याही हुंड्याच्या सामाजिक जुलमामुळे कुमारिका अविवाहित रहात नाहीत किंवा पूर्वीही रहात नव्हत्या?
‘‘अनावृताः किल पुरा स्त्रिय आसन् वराननें’’ असे पांडू राजाने कुंतीला (आदिपर्वात) स्पष्ट सांगितले आहे. बरे, त्यातून मुलीचे लग्न केलेच पाहिजे आणि ते अमुक एका वर्षाच्या आतच केले पाहिजे, अशा अशास्त्रीय कल्पनांवर फाजील भरवसा टाकून तिला एखाद्या गुणहीनाच्या पदरी वैरण्यात तरी तिचा बाप कोणते पुण्य संपादन करणार? आपल्या मुलीला अशा रीतीने घरातून ढकलणाराला कन्यादानाचे पुण्य न मिळता
कन्याघाताचे पातक
मात्र त्याच्या शिरावर चढल्याशिवाय खास रहाणार नाही.आद्य स्मृतिकार मनु म्हणतो, ‘‘काममारणात्तिष्ठेद् गृहे कन्यर्तुमत्यपि । नचैवेनां प्रयच्छेत गुणहीनाय कहिंचित्।।’’ गुणहीन माणसालामुलगी देण्यापेक्षा ती आजन्म पितृगृही अविवाहित राहिली तरी हरकत नाही. आजन्म अविवाहित राहून मी स्वराष्ट्रसेवा किंवा समाजसेवा करीत राहीन अशी जर तरुणांना प्रतिज्ञा करून राहता येते, तर कुमारिकांनाच ते का करता येऊ नये? काय साजसेवा करा-या सुशिक्षित कुमारिका आजला नाहीत? का पूर्वी कधीकाळी नव्हत्याच? अविवाहित ब्रह्मवादिनी व विवाहित गृहस्थाश्रमी असे स्त्रियांचे दोन भेद पूर्वीही होते असे हारीत सूत्रावरूनही सिद्ध होत आहे. गार्गी, सुलभा, वडवा या वेदकालीन वेदांच्या ऋचा रचणा-या स्त्रिया कोण होत्या? कुमारिका. महाभगवद्भक्त मीराबाई आणि ज्ञानोबांची बहीण मुक्ताबाई या आमरण कुमारिकाच होत्या ना? या कुमारिका देवींचे राष्ट्रावर केवढे उपकार झाले आहे! आता आमच्या सगळ्याच कुमारिका मीराबाई, मुक्ताबाई जरी निपजल्या नाहीत, तरी अविवाहित राहणे हे कोणत्याही दृष्टीने पातक नसून, त्यांना समाजसेवेचे अनेक मार्ग सध्या खुले झालेले आहेत;
त्यांपैकी ज्या मार्गात त्या शिरतील त्यात आमच्या महाराष्ट्रीय कुमारिका पुरुषांपेक्षाच नव्हे पण इतर सर्व भारतीय महिलावर्गापेक्षा
कांकणभर सरस कामगिरी
करून दाखविल्याशिवाय खास रहाणार नाहीत, अशी आमच्याच महाराष्ट्रीय इतिहासाची ग्वाही आहे. भगिनींनो, तुमच्या वैवाहिक संस्कारांत घुसलेल्या या हुंडाराक्षसाचे मर्दन करणे हे आता तुम्हीच मनावर घेतले पाहिजे. तुमच्या एका लग्नाच्या पायी तुमच्या पित्याची मान कर्जाच्या फासावर लटकविण्यापेक्षा
कुमारिकांनो, सत्याग्रह करा
सत्याग्रह करा, सत्याग्रह करा.
अविवाहित राहून शिक्षण संपादन करा आणि आपल्या समाजाच्या व राष्ट्राच्या कार्यक्षेत्रात स्वयंसेविका होऊन त्याचा भाग्योदय केल्याचे श्रेय संपादन करा; हुंड्याच्या रक्ताने बरबटलेल्या वाटेल त्या तरुणाच्या हातात आपला निष्कलंक हात देऊन आपल्या जन्माचे वाटोळे करून घेऊ नका. माझ्या या धाडसी उपदेशावरून प्रतिपक्षियांचा गिल्ला होईल हे मी जाणून आहे. परंतु ‘‘to-day the boldest Hindu reformer admits that to attempt practical reform in his individual capacity is like cutting his own throat anti courting the destruction of his innocent family.’’ या स्वर्गवासी मलबारी शेटच्या स्वानुभविक उद्गारांची पूर्ण जाणीव ठेवून, केवळ सत्याचाच काय तो भरवसा व आधार आहे, इतके सांगून मी आपली सर्वांची अधिक उण्या शब्दयोजनेबद्दल अत्यंत नम्रतेने क्षमा मागून हा विषय येथे पुरा करतो.