कोदण्डाचा टणत्कार
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
दुसऱ्या आवृत्तीचं पहिलं पान
कोदण्डाचा टणत्कार
अथवा
भारत इतिहास संशोधक मंडळास उलट सलामी.
लेखक व प्रकाशक
केशव सीताराम ठाकरे
वज्रप्रहार ग्रंथमाला कचेरी,
२० मिरांडाची चाळ, दादर, मुंबई - १४.
किंमत दीड रुपया
पहिली आवृत्तीचं प्रकाशनवर्ष १९१८
दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशनवर्ष १९२५
(या ऑनलाईन आवृत्तीसाठी दुसरी आवृत्ती आधार मानलीय.)
अर्पण-पत्रिका
प्रतिस्पर्ध्यांच्या निंदेला, कारस्थानांना आणि नानाविध छ्ळांनान जुमानता, धार्मिक व सामाजिक स्वयंनिर्णयाच्या सक्रीय संदेशाने बहुजन समाजाच्या आत्मिक प्रबोधनाचे चिरंजीव राष्ट्रकार्य करणारे प. वा. राजर्षि श्रीशाहू छत्रपति करवीरकर
आणि
आंग्लाईच्या पहिल्या भर अमदानीत चांद्रश्रेणीय कायस्थ प्रभू समाज आत्मज्ञानपराङ्मुख झाला असता, स्वार्थत्यागपूर्वक जुन्या ऐतिहासिक बखरीचा जीर्णोद्धार करून त्यांच्यात आत्मज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणारे इतिहासपंडित प. वा. रायबहादुर भाईसाहेब गुप्ते
यांच्या दिव्यात्म्याला हा टणत्कार साष्टांग प्रणिपातपूर्वक
अर्पण असो!
केशव सीताराम ठाकरे,
प्रास्ताविक खुलासा
या पुस्तकाची पहिली आवृत्ति कार्तिक शु १५ त्रिपुरी पौर्णिमा शके १८४० (ता. १७ नवंबर १९१८) रोजी प्रसिद्ध झाली व अवघ्या एकच महिन्यांत सर्व प्रति खलास झाल्या तेव्हांपासून आतापर्यंत मागणीचा जोर सारखा वाढत आहे. पहिली आवृत्ति इन्फ्लूएंझाची साथ जगदी जोरात असताना घाईघाईत दोन छापखान्यांत कशी तरी छापून काढली होती. या द्वितीयावृत्तीत पुष्कळच नवीन मजकूरघालून कित्येक अस्पष्ट विधाने स्पष्ट केली आहेत. विशेषतः छत्रपति संभाजीच्या चरित्रावर अगदी नवीन प्रकाश पाडणारा ऐतिहासिक मजकूर वाचकांना प्रथम याच पुस्तकांत पहावयास मिळत आहे. प्रस्तुत पुस्तक प्रथमतः भारत इतिहास संशोधक मंडळास प्रत्युत्तरादाखल म्हणून जरी लिहिले होते, तरी विधाने स्पष्ट करताना घातलेल्या चर्चात्मक मजकुरामुळे, त्याचे एकांगी स्वरूप जाऊन, त्याला एका इतिहास विषयक चिकित्सक निबंधाचे स्वरूप आले आहे. किंबहुना असेही म्हणता येईल की हे पुस्तक म्हणजे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाचे रहस्य अचुक पटविणारे हॅन्डबुक होय.
भिक्षुकी कारस्थानामुळे क्रान्तीचक्रात सर्वस्वाचा होम झाला असता आणि हुंडाविध्वंसनाच्या चळवळीमुळे आमच्यावर बिथरलेल्या कायस्थ प्रभू निंदकांच्या विरोधाचा जोर भयंकर असताहि, ही द्वितियावृत्ति लिहून काढण्याइतकी मनाची शांति ज्या भगवान् श्रीकृष्णाने अभंग राखिली त्याला अनन्य भावे साष्टांग प्रणिपात करून हा टणत्कार निस्पृह व विवेकी देशबांधवांना विचारक्रांतीकारक होता, अशी अपेक्षा करून "शंभर वर्षापूर्वीचे महाराष्ट्र" अथवा "हिंदवी स्वराज्याचा खून" या ऐतिहासिक ग्रंथाच्या प्रकाशनाकडे वळतो.
सर्वांचा नम्र सेवक,
केशव सीताराम ठाकरे
श्री शिवजयंती, २५ एप्रिल १९२५
वज्रप्रहार ग्रंथमाला,
२० मिरांडाची चाळ,
दादर, मुंबई १४.
भाग १
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
प्रहर नमतु चापं प्राक्प्रहार प्रियोऽहम्।
मयि तु कृतनिधाते कि विदध्या परेण ॥
- महावीरचरित
विषयप्रवेश
पुणे आणि पेशवाई महाराष्ट्राच्या बोकांडी बसलेले भूत म्हणजे चित्पावन पेशवाई आणि या भुताचा भूतखाना म्हणजे पुणे!! पेशवाई ओंकारेश्वरावर कधीच गेली असली तरी तिच्या कोळशाच्या वैभवाची स्मारक पुणेकर चित्पावन आपल्या बुद्धिवैभवात असूनहि वरचेवर घटवीत असतात. पुण्यास चाललेल्या नानाविध चळवळी केवळ वर्तमानपत्री डांगोऱ्यांतून ऐकणाऱ्यांना किंवा वरवर पहाणाऱ्या बावळटांना असे वाटते की ही पुणेरी भटमंडळी देशासाठी अगदी जीव द्यायला उठलेली आहेत. केवढे त्यांचे गिरसप्पी वक्तृत्व, काय त्यांचे शिक्षणप्रयत्न, काय त्यांची ती धडापासरी साप्ताहिके, दैनिक आणि मासिके, केवढाल्या त्यांच्या राष्ट्रीय संस्था, किती लांबरुंद त्यांचे रिपोर्ट मोठमोठे त्यांचे राष्ट्रीय फंड, राष्ट्रीय पुरुष आणि राष्ट्रीय पुतळे! सगळेच पेशव्यांच्या पगडीसारखे अचाट आणि अफाट एखाद्या विधवा भटणीची घाणेरडी खाणावळ असली तरी तिचे नांव केवढे मोठे अगडबंब! अखिल भारतीय मानव-जीवन-संरक्षक सार्वजनिक अन्नपूर्णा कल्पतरू सदन असल्या मालगाडी वजा नावाचे
भारत-इतिहास संशोधक-मण्डल
नांवाचे एक उपद्व्यापी मण्डळ पुण्यास आहे. सगळ्या भारतखंडाचा इतिहास शोधून काढण्याच्या अहमहमिकेच्या काढण्या या मंडळांतल्या उपद्व्याप्यांच्या मानेला लागल्या आहेत. पुण्याच्या चित्पावनी राष्ट्रीय रिवाजानुसार या मण्डळालाहि सार्वजनिकपणाचा मुलामा देण्याची व जगातल्या सर्व अकलेचा कोठावळेपणा आपल्याकडे घेण्याची उत्पादकांनी व प्रवर्तकांनी पुष्कळच खटपट केली असल्यास त्यांत फारसे नवल नाही. थोडक्यांत सांगायचे म्हणजे उप्पर तो और बनवाया है, अंदर की बात बम्मन जाने, बाहेरचा दिखाऊ भपका तर आकाशाइतक्या सार्वजनीक व्यापकपणाचा, आंतली घाण म्हणजे केवळ नाकझरी! या मंडळाचे वार्षिक रिपोर्ट प्रसिद्ध होत असतात. त्यांत मामूली कार्याचा आढावा असल्याशिवाय काही स्वयंप्रतिष्ठित इतिहास संशोधकबुवाची टिपणे टांचणे मोठमोठे लेखहि असतात. या संशोधकसेनेचे गुरुवर्य उर्फ कॅपटन श्री. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे, बी.ए. हे सुप्रसिद्ध एककल्ली गृहस्थ होत. हे मंडळ सार्वजनीक म्हणवीत असले तरी त्यातले कार्यकारी व संशोधन म्हणजे एकजात एकरकमी एका पराचे ब्राह्मण. पुण्याची तर हीच मोठी विशेष आहे. येथील वाटेल ती संस्था किंवा चळवळ घ्या. तिचा गवगवा मात्र मोठ्या सार्वजनिकपणाचा, पण कारभारी पाहिले तर सगळे पेशवे सांप्रदायी ब्राह्मण उगाच नांवाला एक दोन बावळट ब्राह्मणेतर असली की नाटक रंगलें एवढी मोठी केसरी-मराठा संस्था, पण भटाशिवाय तिथे कोणाचीच डाळ शिजत नाही. पूर्वी शिजली नाही. पुढे शिजणे शक्य नाही.
वाईची प्राज्ञपाठशाळा फक्त निर्भेळ ब्राह्मणांसाठी, इतर कोणाचाहि तेथे शिरकाव होत नाही. पण अखिल महाराष्ट्रीयांनी या लोकोपयोगी (?) संस्थेला हमखास मदत करावी म्हणून सार्वजनिक केसरीकार दरवर्षी किती तरी स्फुट खरडीत असतात. भा.इ.सं. मंडळात वाटेल त्याने यावे असा त्यांचा जाहीरनामाच आहे. पण जेथे मुळातच भटांचा सुळसुळाट तेथे इतर जातो कोण मरायला? आणि गेलाच तर या पेशवाई कारभाराच्या पातळ भाजीत त्या बावळटाची दाद तितकीच लागते. खाणावळीच्या आमटीत डाळीच्या पिचकणाची जेवढी आशा, तेवढीच पुणेरी भटांच्या
सहकार्यापासून इतरांना आशा.
सदर्हू मण्डल कोणत्या परसातली भाजी हे पहिली तीन वर्षे फारसे कोणालाच माहीत नव्हते. पण लोक जर आपल्याकडे पहात नसले तर आपल्याच घराला आग लावून त्यांचे लक्ष वेधण्याच्या अमानुष युक्तीचा अवलंब करावयाचे ठरवून, मण्डळाने आपल्या चवथ्या वर्षाच्या रिपोर्टात
कायस्थ प्रभूंची बदनामी
करणारा श्री राजवाडे याचा माथेफिरूपणालाहि लाजविणारा एक लेख प्रसिद्ध केला. हे रिपोर्ट फार महाग किंमतीने विकले जात असल्यामुळे ते कोणी फारसे घेत नाहीत. अर्थात् हा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर बरेच दिवस त्याकडे कोणाचेंच लक्ष गेले नाही. वर्तमानपत्रातील अभिप्रायाकडे पहावे, तो चालू मन्वंतरांतली ही शक्ति बिनशर्त ब्राह्मणांच्याच हाती असल्यामुळे, त्या लेखातल्या हलकट विधानांची वाच्यता कोण कशाला करतो? इतकेच नव्हे तर तो लेख मण्डळाच्या वार्षिक संमेलनात श्री राजवाडे यांनी मोठ्याने वाचला, सर्व श्रोत्यांनी सावधान चित्ताने ऐकला. निवडमंडळाने कोहीनुराप्रमाणे निवडला आणि अखेर तो छापून प्रसिद्धहि झाला. पण कोणी हूँ का चू केले नाही. महाराष्ट्रांतील एका सुसंस्कृत समाजाची हकनाहक बदनामी करणारा लेख इतक्या सर्व पायऱ्या ओलांडून बेधडक बाहेर पडतो आणि मंडळातल्या अध्यक्षा पासून तो खालच्या झाडूपर्यंत त्याविषयी कोणी चकार शब्दहि काढीत नाही. या गलधटपणाला काय नाव द्यावे हेच समजत नाही, सध्याचा काळ धार्मिक किंवा सामाजिक बाबतीत तंटे बखेडे करून, राष्ट्रीय आकांक्षांना विरोध करण्याचा नव्हे, याची आम्हांला पूर्ण जाणीव आहे. इतकेच नव्हे तर प्राचीन हाडवैराची गाडली गेलेली भुते आपापल्या थडग्यांतून कधीकाळी पुन्हा बाहेर पडल्यास महाराष्ट्राच्या भवितव्यतेवर त्यांच्या तांडवनृत्याचा केवढा प्राणघातक परिणाम होईल, याचे भेसूर चित्र आम्हांला दिसत नाही, अशांतलाहि प्रश्न नव्हे. परंतु राष्ट्रेक्याची सताड पुराणे झोडणारे आमचे पुणेकर चित्पावन देशबंधूच जेव्हां इतिहास संशोधनाच्या ढोंगाखाली चांद्रश्रेणीय कायस्थ प्रभूवर हा नवीन ग्रामण्याचा हल्ला चढविण्यात पुढाकार घेतात, तेव्हां हेच खरे देशाचें दुदैव नव्हे काय? ब्राह्मण समाजांच्या मानाने कायस्थ प्रभु हा अत्यंत अल्प संख्यांक परंतु अत्यंत प्रभावशाली समाज आहे. ब्राह्मणेतर समाजातल्या शेंकडों जातीच्या लोकसंख्येपुढेहि हा समाज अगदीच चिमुकला आहे. अल्पसंख्य आहे. चिमुकला आहे. मितभाषी आहे. चित्पावनाप्रमाणे उठल्या सुटल्या उगाच एखाद्या क्षुद्र बाबीची बोंबाबोंब करणारा नव्हे. तरी देखील बुद्धिमतेच्या प्रभावांत तो कोणत्याही महाराष्ट्रीय समाजाला हात धरू देणारा नव्हे. कायस्थांच्या कलमसमशेरीनेच शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा पाया घातला आणि आजहि तिच्या प्रभावाची दहशत शुद्धतेची शर्यत जिंकलेल्या चित्पावनांच्या हृदयात घुसळा घालीत असते. म्हणून मंडळाच्या रिपोर्टासारख्या कुंपणाआडून चोरटा गोळीमार त्यांना करावा लागतो.
कायस्थ प्रभूंचा बराच इतिहास अझून उजेडात यावयाचा आहे, म्हणजे, त्यांच्या अस्तित्वाचा शेंडा बुडखासुद्धा उमगणार नाही. किंवा हे कोणत्या झाडाचे पाले, कोठून आले. पूर्वी कोण होते, राक्षस वनचर अनार्य शूद्र होते की आणखी कोण होते, हेंहि न समजण्याइतकें ऐतिहासिक साहित्य आज उपलब्ध नाही, असा प्रकार मुळींच नाही पण उपलब्ध इतिहास मुळीच लक्षात न घेता. एका फाटक्या तुटक्या चिठोऱ्याचा जीर्णोद्धार करण्याच्या सबबीवर, त्याच्या सर्व धार्मिक, सामाजिक आणि राजकीय संस्कृतीला कवडीमोल ठरविणारा डेमी ८ पेजी संचाचा तब्बल २२ पानी निबंध छापून काढण्याची मंडळाला जी कुप्रेरणा झाली. तिच्या मुळाशी
चित्पावन आणि कायस्थ प्रभु
या दोन समाजातील ऐतिहासिक हाडवैराशिवाय दुसरा कोणताच हेतु संभवत नाहीं, हें पुढील विवेचनावरून स्पष्ट दिसून येईल.
अर्थात् प्रस्तुतचा वाद कालमानाप्रमाणे कितीहि विघातक असला, तरी ज्या अर्थी भारत इतिहास संशोधक मंडळानेंच तो उकरून काढून कायस्थ प्रभू समाजाला एका प्रकारें यादवी युद्धाचे आव्हान केले आहे. त्या अर्थी
होऊ द्याच तर दोन हात
असा कोदण्डाचा टणत्कार करून मंडळाच्या सलामीला उलट सलामी देणें आता आम्हांस अपरिहार्यच आहे. या अनवश्यक वादाचें पिते श्रीयुत राजवाडे हें इतिहास- साहित्य संग्राहक हाणून चांगली प्रख्या पावलेले आहेत. `मराठ्यांच्या इतिहासाची साधने शोधून ती संकलीत करण्यांत राजवाडे यांनी जे परिश्रम केलें व स्वार्थत्यागाची जी परासीमा गांठली, ती महाराष्ट्रांत अक्षरश: अद्वितीय व अत्यंत कौतुकास्पद आहे. आम्ही तर असेंहि म्हणतों की श्री. राजवाड्यांचे ‘खंड’ जर बाहेर पडले नसते तर महाराष्ट्रतिहासाच्या क्षेत्रांत खरोखरच ‘सर्व अंधार’ पडला असता राजवाड्यांची ही कामगिरी बहुमोल आहे. इतकंच नव्हे तर दुसरा राजवाडे प्रसवायला महाराष्ट्राला आणखी एक दोन शतकांचीहि तपश्चर्या अपुरी पडेल. असे आमचे प्रांजल मत आहे. परंतु राजवाड्यांच्या या बहुमोल कामगिरीचे त्यांच्या चित्पावनी हृदयानें पार मांतरें केलें आहे. असे कष्टाने म्हणावें लागतें. मेंढी दूध देते पण लेंड्यांनी घाण करते, असलाच हा प्रकार आहे. ते कष्टाळू संग्राहक आहेत, पण प्रामाणिक संशोधक नव्हते. ते जेव्हां संशोधकी घमेंडीनें संग्रहीत कागद पत्रातील मजकुराची ठरवाठरव करूं लागतात आणि चिकित्सेच्या दिमाखाने विधानांची अंडी उबऊ लागतात, तेव्हां ‘मोडतोड तांबापित्तल’ वाल्यानें केमिकल अनालायझरचें काम करण्याचा आंव घालण्यासारखा मूर्खपणा त्यांच्या हातून घडत असतो. इतिहास-संशोधनाचे कामी त्यांनी आजपर्यंत जो खेळखंडोबा केला. कमअस्सल कागदपत्रंना अस्सलपणाचा बाप्तिस्मा देण्यांत जी हातचलाखी दाखविली आणि एखाद्या क्षुल्लक
वेलांटीच्या आधारानें गोलांटी उडी
मारून, सुताने स्वर्गाला जाण्याचा कसकसा आणि केव्हा केव्हा उपक्रम केला, त्याची वाच्यता म्हटले तर निराळाच ‘मंडळ-धर्म-दीप’ लिहावा लागेल. अनेक इतर संशोधकांनी व विविधज्ञानविस्तारादि मासिकांनी त्यांना वेळच्या वेळी सप्रमाण प्रत्युत्तरे देऊन त्यांचा चित्पावनी खोडसाळपणा महाराष्ट्राच्या नजरेस आणलाच आहे. खुद्द केसरीने ९ जून १९१४ च्या अंकांत या राजवाडी माहात्म्याविषयी काय उद्गार काढले आहेत ते पहा:----" मात्र कागदपत्र प्रसिद्ध करण्याच्या कामी एकसूत्रीपणाच्या अभावाचा दोष त्यांच्या संशोधनाच्या कार्यात उघड दिसून येतो. तसेंच थोडया पुराव्याच्या पायावर अनुमानाची भली मोठी इमारत उठविण्याचे धाडस ते पुष्कळ वेळा करितात आणि प्रतिपक्षावर टीका करण्याच्या भरात येण्यास त्यांना फारसा वेळ लागत नसून, भरात आल्यावर त्यासंबंधी एकांतिक व अवमानकारक अशी विधाने करण्याचा मोह त्यांना सुटत नाही." केसरीचे हे निस्पृह सर्टिफिकीट प्रस्तुतच्या वादाला किती समर्पक लागू पडते, याचा वाचकांना यथाक्रम यथाप्रमाण परिचय पुढे होईल. राजवाडे हे संग्राहकाचे संशोधकच बनून राहिले नाही, तर अलीकडे त्यांनी ‘समाजशास्त्री’ पद पटकविण्याची जारीने खटपट चालू केली आहे. इतिहाससंशोधनाच्या उपद्व्यापाला पाठबळ म्हणून समाजशास्त्राध्ययनाचा जो खटाटोप त्यांनी आरंभिला आहे, त्याच्या सांगतेसाठीं चित्पावनेतर अखिल हिंदुसमाजाच्या
बीज-क्षेत्र शुद्धीचें पृथ:करण
त्यांनी हाती घेतले आहे. या उत्कांठेची तळमळ त्यांना लागली असतांनाच, सातारकर महाराजांच्या हतभागी कागदपत्रांच्या गळाठ्यांत त्यांना कायस्थधर्मदीप नामक जीर्ण महाग्रंथाचे एक पुडकें हस्तगत झाले. विद्यमान सातारकर महाराज आणि त्यांच्या कारभाऱ्यादि शुंभनिशुंभांची प्रभावळ हाच मुळी एक मोठा चमत्कारिक गळाठा आहे! आमची अशी माहिती आहे की सातारा रेकार्डमधील कागदपत्रांवर अलीकडे काही वर्षे चांगली पाळत ठेवण्यांत आलेली असून ते नुसते पहाणारास किंवा चाळणारांस बऱ्याच वशिल्याच्या तट्टांची पायधरणी करावी लागते मग तेथून पुडकी हस्तगत करण्याची गोष्ट तर निराळीच!
मग राजवाड्यांनाच हें पुडकें कसें मिळालें? याहि बाबतीत आम्हाला दाट संशय आहे की या पुडक्यानें कोणा तरी कारस्थानी प्राण्याचा खिसा थोडा बहुत गरम झाल्याशिवाय ते गळाठ्यांतून बाहेर निसटलें नसावे, राजवाडे हे पूर्वीप्रमाणे नुसते संग्राहकच असते, तर त्यांनी या पुडक्यांतील मजकूर जशाचा तसा छापून ते मोकळे झाले असते, पण ते आता बनले आहेत समाजशास्त्री. ज्या कायस्थ ज्ञातीबद्दल शब्दाच्या व्युत्पत्त्या ठरविण्यात ‘कायस्थ इति लघ्वी मात्रा’ इत्यादी नाट्यवचनांचा देखिल त्यांनी पुरस्कार केला, त्याच ज्ञातीबद्दलचा (?) हा ग्रंथ! मग काय विचारतां? या विद्वान समाजशास्त्राचा आनंद गगनात मावेना. त्यांना चां. का. प्रभूंच्या इतिहासाच्या
मुळाशी हात घालण्याची ईर्षा
उत्पन्न झाली, आणि आजपर्यंत अध्ययन करून कमविलेल्या समाजशास्त्रप्राविण्याची कसोटी कायस्थ प्रभू समाजाच्या धार्मिक, सामाजिक, नैतिक व राजकीय इतिहासाच्या शिळेवर घासून पहाण्यास त्यांनी कंबर कसली. मराठी स्वराज्याच्या स्थिति आणि लय कालात चित्पावनांना सर्वच बाबतीत पुरून उरणारे असे कायस्थ प्रभूच त्यांचा धुव्वा उडवितां उडवितांच चित्पावन पेशवे रसातळाला गेले खरे, पण ते कार्य अपुरेच राहिले. ते श्री राजवाडे पूर्ण करणार पूर्ण करण्यापुरती विश्वसनीय सामग्री जरी लागली नाही, तरी कायस्थ धर्मदीपाची सबब तरी हाती पडली. बस झाले काम एनकेन प्रकारेण या अल्पसंख्य परंतु चित्पावनांना तुल्यबली किंबहुना शिरजोर असणाऱ्या कायस्थ प्रभूची अनुलोम प्रतिलोमाच्या भट्टीत दामटी वळवून त्यांचा सामाजिक व धार्मिक दर्जा जाहीर रीतीनें पाण्यापेक्षा पातळ केला की राजवाडयाची तळमळ शांत . माझा नवरा मेल्याचे दुःख नाही, पण तुझ्या कपाळी कुंकू मला पाहवत नाही. एवढीच सामान्यत: चित्पावनी हृदयाची तळमळ असते. पण येथेहि राजवाड्यांनी आपल्या विशिष्ठ पूर्वापार परंपरेला अनुसरून पिशाचाच्या उलट्यां पावलांचा क्रम स्वीकारला, असे आमचे मत आहे कायस्थ प्रभूंच्या घरातील वांसे मोजण्यास किंवा त्यांच्या उत्पत्तीचे मूळ शोधण्यासाठी त्याच्या बीजक्षेत्राची ठरवाठरव करण्यास आपल्या मौल्यवान समाजशास्त्रप्राविण्याचा व्यय न करता, वास्तवीक त्यांनी आपलेच घर प्रथम नीट पारखून पहावयास हवे होते. चित्पावनांस
क्षितिपावन ठरविण्याचा अट्टहास
करणाऱ्या राजवाड्यांनी आपल्या संशोधक बुद्धीचा दिवा पाजळून आपल्याच ज्ञातीच्या धार्मिक, सामाजिक व राजकीय इतिहासाचे घर नीट तपासून पाहिले असते, तर इतिहास-संशोधन आणि समाजशास्त्रप्राविण्य या दोन दिव्य रसायनांचे अंजन पडलेल्या त्यांच्या डोळ्यांना क्षितिपावनत्वाचा एखादा शिलालेख किंवा ताम्रपट हस्तगत होण्याचा पुष्कळच संभव होता. शिवाय, हा संभव खराच फलदायी ठरता तर त्यांच्या अध्ययन तपश्चर्येची ही पहिलीच ‘भवानी’ कायस्थधर्मदीपाच्या पुण्याईपेक्षा कितीतरी पट अधिक श्रेयस्कर झाली असती.अझूनहि त्यांनी आपल्या चित्पावन समाजाच्या संस्कृतीला समाजशास्त्राचा कस लाऊन पहावा, अशी आमची त्यास आग्रहाची विनंती आहे. म्हणजे घारे डोळे. पिंगट केस व भुरी कातडी काय काय बिनमोल शोधाचे वाण राजवाड्याच्या पदरात टाकतील ते नीट समजेल, चित्पावनांना कसे बसें क्षितिपावन बनविणे, ही मयत पेशवाई नोकरशाहीची अपुरी राहिलेली इच्छा श्री. राजवाडे किंवा त्यांचे भगत पूर्ण करतील तरच
शतसांवत्सरिक श्राद्धाचे पिंड
परलोकवासी पेशव्यांना रुचतील व पचतील, कायस्थ प्रभूच्या मुळाशी हात घालून काय फायदा? दुसऱ्याची कुचेष्टा केल्याशिवाय आपली प्रतिष्ठा वाढत नाही, एवढ्याच उद्देशाने त्यानी आपल्या दिव्य समाजशास्त्राच्या भट्टीत कायस्थ प्रभूंचा उपलब्ध इतिहास जाळण्याचा उपक्रम केला असेल, तर त्यांनी खुशाल आपला हा क्रम आणखीही असाच पुढे चालू ठेवावा.
कायस्थ प्रभूंचा कोणताहि इतिहास त्यांच्या भट्टीच्या पचनी पडण्याइतका कमकुवत किंवा निःसत्व झालेला नाहीं.
पोथीचें पुराण
सातारी गळाठ्यांतत राजवाड्यांना जी पोथी सांपडली तिची लांबी रुंदी पृष्ठसंख्या वगैरे माहिती मंडळाच्या रिवाजानुसार देतांना अशी विधानें केली आहेत:- " (१) एकंदर पानें ५० पैकी २८. पासून ५० पर्यंत कसरीनी पोखरून टाकलेली आहेत. (२) छत्रपतीच्या ग्रंथालयांत न्यायाधीश व पंडितराव ह्या पोथीचा उपयोग करीत. [ कशावरून? राजवाडे म्हणतात म्हणून.] (३) कायस्थांचे धर्म, आचार संस्कार शिवाजीच्या काली बाळाजी आवजीच्या संमतीन गागाभट्टानें ठरऊन दिले, ते ह्या पोथीत आहेत. [ राजवाड्यांच्या तर्काप्रमाणे स्वतःच्या जातीला नीच शूद्रत्वाची सनद गागाभट्टाकडून घेणारा बाळाजी तरी पागल असला पाहिजे किंवा हा विद्यमान तार्कीक गंजड असला पाहिजे, या शिवाय तिसरें अनुमानच निघत नाहीं.] तेव्हां आता कायस्थांच्या आचारासंबंधानें संशयाला व वादाला बिलकूल अवकाश राहिलेला नाही." हा अखेर निर्णय राजवाड्यांनी एखाद्या शालजोड्या धर्ममार्तंडाच्या अवसानांत झोकून दिला आहे. अर्ध्या अधिक कसरीने खाऊन फस्त केलेलें हें राजवाडी पातडें म्हणजे काय? तर शिवराजप्रशस्ति व कायस्थ धर्मदीप. केवढा अचाट हा शोध! जणू काय मोठा दुष्प्राप्य वेदच हुडकून काढला! कायस्थधर्मदीप हा ग्रंथ सन १८७२ सालींच मुंबईच्या `जगदीश्वर` शिळाप्रेसांत छापून प्रसिद्ध झाला होता, त्याच्या हजारों प्रति भटांच्या घरोघरी अझूनहि सांपडतात. एवढ्यासाठी सातारी गळाठ्याचा उकीरडाच फुंकण्याचे काही प्रयोजन नव्हते. किंवा पूर्वी हा ग्रंथ प्रसिद्ध झाला तेव्हां कायस्थ प्रभूच्या सामाजीक व धार्मिक अधिकारांबद्दल कोणी शहाण्याने एवढें चित्पावनी आकांड तांडवहि केलें नव्हतें. परंतु इतिहासाचे संशोधन करणारा बृहस्पति काय तो मीच आणि मी छापून प्रसिद्ध केल्याशिवाय जुन्या गळाठ्यांना जीर्णोद्धार किंवा धार्मिक वादविवादांचा अखेर निर्णय कधि लागणेंच शक्य नाहीं हीच ज्यांची घमेंड, त्यांनी इतर ठिकाणी कोणकोणते जुने पुराणे ग्रंथ छापून प्रसिद्ध होत आहेत किंवा झाले आहेत याची पर्वा का करावी? ` कायस्थ धर्मदीप हे नांवच पाहून राजवाडे समाधीसुखांत गाढ झाले. शिवकालापासून ब्राह्मणांना पुरून उरणाऱ्या आणि भटी पेशव्यांच्याहि चित्पावनी काव्याला वरचेवर फूटबॉली टांचा हाणणाऱ्या कायस्थप्रभूंचा एकदा झणझणीत पाणउतारा करण्याची त्यांच्या अंगांत विलक्षण शिरशिरी भरती. कायस्थांचे वाटोळे होण्याचा प्रत्येक प्रसंग म्हणजे पुणेरी चित्पावनांना अझूनहि पुत्रजन्मोत्सव वाटत असतो! अर्थात् या विशिष्ट ग्रहाची का फुललेल्या राजवाड्यांच्या डोळ्यांना
"आदी अस्मिन्नग्रंथे संकरज कायस्थानां धर्मकर्माण्युच्यन्ते ।
चित्रगुप्तचांद्रसेनीय कायस्थयोश्च धर्मकर्माणि कायस्थप्रदीप ग्रंथे वक्ष्यामि ॥”
[ अर्थ:-- प्रथमतः या (कायस्थ धर्मदीप) ग्रंथांत संकरज कायस्थांच्या धर्मकमांचे कथन करितों. पुढे ‘कायस्य प्रदीप’ नामक ग्रंथांत चित्रगुप्त आणि चांद्रसेनीय कायस्थांची धर्मकर्मादि या वर्णन देईन] हा स्पष्ट स्पष्ट असलेला उल्लेख दिसेल कशाला? जो ग्रंथ वास्तवीक मूळ संकरज कायस्थाकरिता लिहिलेला तो दिला भिरकाऊन या शहाण्या समाजशास्त्राने चांद्रसेनीय कायस्थ प्रभूच्या मुस्कटावर! इतिहास संशोधनाच्या किंवा समाजशास्त्राच्या दृष्टीने हे किती नीचपणाचे धाडस आहे.याचा नि:पक्षपाती सज्जनानीच विचार करावा. कायस्थ धर्मादीपाची छापील प्रत सन १८७२ साली आणि कायस्थ धर्मादीपाची अस्सल प्रत सन १८८८ सालीच उपलब्ध झालेली आहे कायस्थ प्रभूचे म्हणणे की गागाभट्टाने आमच्याकरिता प्रदीप लिहिता पण येथेसुद्धा
गागाभट्टाचा हलकटपणा
सिद्ध होत आहे. ब्राह्मणेतरांच्या धर्माचरणाचा बरा वाईट निर्णय ब्राह्मणांनीच दिला पाहिजे, ही जी मानसिक गुलामगिरी अखिल ब्राह्मणेतर हिंदु समाजाच्या बोकांडी बसलेली आहे, तिचा गागाभट्टाने रुपयाला वीस आणे पुरापूर फायदा घेतला. ब्राह्मणच काय ते कायस्थ प्रभूच्या धर्माधीकाराचे निर्णायक. ही घमेंड राजांच्या प्रस्तुत उपद्व्यापांच्या मुळाशी सणसणत आहे. गागाभट्टगागाग्रह दक्षिणेत आल्यावर त्याने येथील ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाची मख्खी प्रथम नीट अजमावली एवढा मोठा अतुल पराक्रमी स्वराज्य संस्थापक शिवाजी व त्याचा बुद्धिवान हस्तक बाळप्रभू चिटणीस, पण केवळ वेदोक्त राज्याभिषेकासाठी दोघेहि भिक्षुकशाहीचे नुसते दासानुदास उर्फ कुत्ते बनलेले.
दक्षिणी ब्राह्मण तर काय खुद ब्रह्मदेवाच्याही बापाचे बाप बनून बसलेले गागाभट्ट झाला तरी जन्माचा भटुरडाच खरे बोलावे तर दक्षिणी ब्राह्मण म्हणजे सापाची अवलाद. एका दंशांत पुढच्या बेचाळीस पिढ्यांच्या अंगावर रक्तपिती उठविणारे. बरें, खोटे बोलावे, तर शिवाजीकडून मिळणारी गडगंज दक्षिणा उघड्या डोळ्यापुढे ठार बुडते. या अडचणीत तो सांपडला असतां त्याने एक `हिंदुस्थानी शकल लढवून दोनहि प्रतिस्पर्ध्यांना गाढव बनविले व आपली तुंबडी भरून काशीला फरारी झाला. त्या वेळी ‘कायस्थ प्रभू आणि ब्राह्मण’ हा तंटा विशेष जोरांत होता.
ब्राह्मणाचे म्हणणे थेट राजवाडी. जबरदस्त शिवाजी एकवेळ क्षत्रिय म्हटला तरी चालेल, पण या शिरजोर कायस्थ प्रभूंना शूद्र तरवा गागाने ताबडतोब कायस्थ धर्मदीप फरकटून दिला भटांच्या पदरात. घ्या हा त्या संकरज कायस्थांच्या धर्माधिकाराचा निर्णय-ग्रंथ! ही बातमी बाळाजी आवजीला कळताच तोहि गागाला भेटला आणि म्हणाला `काय गागाभटजी, हे तुम्ही काय केले? हजरजबाबी गागाने उत्तर दिले, `अरे, ब्राह्मणांना दिलेला दीप संकरज कायस्थाबद्दल आहे. तुझा त्यांत काय संबंध? तुम्हां चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंबद्दल हा पहा मी कायस्थ धर्मप्रदीप लिहिला आहे तो घे.” झाले. या युक्तीनें ब्राह्मण गप्प. बाळाजी गप्प आणि गागाने लाखों रुपयाची दक्षिणा केली गडप. सारांश, दीप आणि प्रदीप या विषयींचा वाद म्हणजे शुद्ध भिक्षुकी कारस्थान होय. यामुळे कायस्थ प्रभू शिवाजी आणि ब्राह्मण हे सर्वच गागाच्या हलकटपणाच्या पचनी पडले याविषयी विस्तृत माहिती घेऊ इच्छिणारांनी आमचा प्रामण्यांचा साद्यंत इतिहास या ग्रंथांतील चवथें ग्रामण्य (१.९ ते २०) मुद्दाम अभ्यासावे, म्हणजे अनेक शंकांची निखालस निवृत्ति होईल.
हिंदु धर्म आणि हिंदु समाज यांच्या विद्यमान अधःपाताला ब्राह्मणांची भिक्षुकशाहीच मुख्यतः कशी जबाबदार आहे. याचे सप्रमाण स्पष्टीकरण भिक्षुकशाहीचे बंड वगैरे अनेक ग्रंथांत आम्ही केलेलें आहेच. इतकेच नव्हे तर हिंदवी स्वराज्याचा खून पाडण्यात दक्षिणी भिक्षुकशाहीच विशेषतः कारस्थानी ठरलेली आहे. भिक्षुकशाही गुलामगिरीचा जबरदस्त पगडा मनावर बसलेल्या पूर्वजांनी शंकराचार्यांची आज्ञापत्रे मिळविण्यासाठी लाखों रुपयांचे शेण केले आणि भटांच्या तोंडून स्वतःस क्षत्रियत्वाचें सर्टिफिकीट मिळविण्यासाठी वाटेल त्या पौराणिक कादंबरीला ब्रह्मवाक्य मानलें, यांत आज आश्चर्य मानण्याचे कारण नाहीं. तो काळ तसाच अज्ञानाचा अर्थात् मूर्खपणाचा होता. वेदोक्तासाठीं पूर्वीच्या कायस्थांनी किंवा शिवाजीच्या जातभाई दक्षिणी मराठ्यांनी भिक्षुकी दास्याचे केवढेहि थेर माजविले असले तरी चालू जागृतीच्या युगांत कायस्थ प्रभू व मराठ्यादि इतर ब्राह्मणेतर ब्राह्मणांना व त्यांच्या वेदोक्त श्रेष्ठ मुनसिपालटीच्या झाडूच्या खराट्याइतकी किंमत देत नाहीत मग वेदोक्त पुराणोक्ताचा आज काय भाव आहे? आज जेथे खुद ब्राह्मणांनाच आपलें ब्राह्मण्य सप्रमाण सिद्ध करण्याची पंचाईत पडली आहे. तेथे त्या गुंडांच्या तोंडचा क्षत्रियत्वाचा निर्णय मानणारा टोणगा कोण असेल तो असो!
आजचे कायस्थ प्रभू आणि मराठे त्यांच्या पूर्वजांनी भटांकडून मिळवलेल्या निर्णय पौराणिक धेडगुजरी गाथांचे किंवा गागाभट्टादि लुच्या भटांनी ठरविलेल्या सामाजीक व धार्मिक उत्पत्त्यांच्या कल्पनांचे गुलाम नव्हत. प्राचीन वंशावळीचे वृक्ष त्यांच्या शाखा उपशाखा ठरविण्यांत ब्राह्मणांच्या कारस्थानी बदसल्ल्यांना बळी पडून अनेक ब्राह्मणेतरांनी आपल्या निर्भेळ परमेश्वरोत् उत्पत्तीसाठी मांडलेली मूर्खपणार्थी प्रदर्शन पाहून कौतुक वाटण्याऐवजी तिटकारा उत्पन्न होतो. छत्रपतींचा वंशवृक्ष म्हणून एक मोठें रंगीबेरंगी नकाशाचे पुस्तक रा. ब. डोंगरे यांनी छापिलें आहे. हा नकाशा सातारी गळाव्यांतच त्यांना सांपडला आणि कै. शाहू छत्रपति करवीरकर यांनी हजारों रुपये खर्चून तो रविवर्मा प्रेसांत छापविला. त्यांत छत्रपतींच्या पूर्वजांचा धागा थेट आदि नारायण ब्रह्माच्या बेंबटात नेऊन घुसविला आहे. बरें झालें, ब्रम्ह्याच्या पुढचा मार्ग या वंशवृक्षनिर्णायकाला दिसला नाहीं. नाहीं तर त्याच्याहि पुढे त्याची मजल गेली असती. सूर्यवंशी आणि चंद्रवंशी क्षत्रियब्रुवांचा अभिमान काय विचारतां?
ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या तोंडातून (वांतीसरसें कीं काय?) पडले तर यांची उत्पत्ति थेट चंद्रसूर्याच्या रेतापासून चंद्रसूर्याणी तरी आपल्या जन्मजात क्षत्रियपणाचे आज्ञापत्र ब्रह्ममुखजन्य किंवा ब्रह्मवत्युत्पन्न भिक्षुकशाहीकडून मिळविलें होतें कीं नाहीं, हें मात्र कळत नाही. शिवाय असाहि प्रश्न उद्भवतो की चंद्रसूर्याला जर पूर्वी पोरें झालीं, तर त्यांच्या बायका कोण? कां ब्राह्मणांच्या उत्पत्तिसाठी ब्रह्मदेवानेंच स्वतःकडे जसे बायकोपण घेतलें, तसाच येथेही प्रकार घडला? बरें, पूर्वी पोरें झाली तर मग आतांच का होत नाहीत? को चंद्रसूर्याच्या रेताचा खजीनाच आटला? का एकेका पोरापुरतेच त्यांनी कंत्राट घेतलें होतें? आणि एकेक पोरगाच ते प्रसविले म्हणावें तर पुढच्या वेलविस्तारासाठी त्यांनी कोणाच्या पोरीशीं लव्हाळीं जमविली? चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंच्या पूर्वजांनी असाच एक धेडगुजरी पौराणीक फार्स आपल्या बोकांडी बसवून घेतला आहे.
चांद्रसेनीय शब्दाची व्युत्पत्ति ठाकठीक जमविण्यासाठी भटांच्या (बद) सल्ल्याने त्यांनी एक चंद्रसेन राजा कल्पनेच्या तणाव्यांत निर्माण केला. `कायस्थ शब्दाची व्युत्पत्ति ‘काये तिष्ठति यः सः कायस्थ’ अशी बसविण्यासाठी, (काल्पनिक अवतार) परशुरामाच्या बाणाला बळी पडलेल्या चंद्रसेनाच्या तरुण गरोदर विधवेला दालभ्य ऋषीच्या आश्रमात पळविली. तेथे ती बाळंत होऊन, तिच्या कायस्थ म्हणजे शरीरात बसलेला पुत्र जगाचा प्रकाश पहाता झाला. त्याचा वेलविस्तार म्हणजे हे चांद्रसेनीय कायस्थ किती मूर्खपणाची ही व्युत्पतिः । चंद्रसेनाचा पोरगाच तेवढा आपल्या आईच्या उदरांत-देहांत कार्येत तिष्ठला, ‘स्थ’ झाला आणि बाकीची मानव जाती काय करते? प्रत्येक प्राणी कीडमुंगीसुद्धा उत्पत्तिपूर्वी आपल्या आईच्या उदरांत कायस्थ नसतोच की काय? मग या कायस्थ व्युत्पतीचे शहाणपण कशात ठरविले ते समजत नाही.
प्रत्येक भूतजात कायस्थ असतो पण धर्ममार्तंड गागा भटजी. चार वेद आणि सहा शास्त्र पढलेले बृहस्पती कायस्थ धर्मदीप प्रकरण १ पान १७ ओळ १ वर मोठ्या व्युत्पत्तिकराचा डौल आणून जेहते लिहितात आणि कित्येक विद्यमान भिक्षुकशाहीचे गुलाम कायस्थ प्रभू मोठ्या अभिमानानें वेदतुल्य वाक्य मान्य करतात की :--
चंद्रसेन भार्योत्पत्रो यः स दाल्भ्यमुनिना
चित्रगुप्तवंशस्य कन्यया विवाहितस्तस्मै
चित्रगुप्तधर्मो लेखनवृत्यादिरपि दत्त
स्तस्मात्तदुत्पन्ना ये चांद्रसेनीय कायस्थारते
चित्रगुप्तसमान धर्माणो भवन्ति ॥
वाहवा! काय इतिहास, केवढा धर्माधिकार केवढी रॅशनल व्युत्पत्ति सगळेच काही भिक्षुकी थाटाचे. हो पण एवढ्यावरच गाडे थांबत नाही. चांद्रसेनीय कायस्थ हे ‘हैहय कुलोत्पन्न क्षत्रिय’ आहेत, हे सिद्ध करताना बडोद्याच्या एका मूर्ख कायस्थ संशोधकब्रूवानें भगवान् श्री विष्णूवर भयंकर प्रसंग आणून भिडविला आहे. कोठच्याशा एका भिक्षुकी पुराणाच्या आधाराने श्रीविष्णूला त्याने घोड्याचा अवतार देऊन लक्ष्मीलाहि घोड़ी बनविले व या पारमेश्वरी दांपत्यापासून हैहय क्षत्रियाची उत्पत्ति करविली आहे. स्वत:च्या कुळामुळाचा श्रेष्ठपणा ठरविण्यासाठी देवालाहि घोडा बनविण्यास न कचरणान्या गाढवांच्या माणुसकीचा पुरावा कोण कसा व कोठे देणार?
****
भाग २
खरा इतिहास
चांद्रसेनीय हा शब्द अपभ्रंश आहे. मूळ शब्द चांद्रश्रेणीय असा असून, त्यांत चंद्रसेन नाही, त्याची बायको नाही. तिच्या पोटातले पोर नाही, दालभ्य ऋषी नाही. परशुराम नाही, कोणी नाही. चांद्रश्रेणीय हा स्थलवाचक शब्द आहे. काश्मिरातल्या चिनाब नदीच्या खोऱ्याला प्राचीन संस्कृत ग्रंथात चांद्रश्रेणी असे नाव आहे. या खोऱ्यात किंवा चिनाब नदीच्या कांठच्या प्रदेशांत रहाणारे ते चांद्रश्रेणीय नद्यांची नांवे मुलींना देण्याचा प्रघात अजूनहि हिंदुसमाजात बराच आहे. कायस्थ प्रभू यांच्या ऐवजी चंपा मालती गुलाब किंवापिरोन इत्यादि फुलांची नावे मुलींना चिकटू लागली असली, तरी कोणत्याहि ब्राह्मण ब्राह्मणेत्तर समाजांत मुळीच प्रचलीत नसलेले `चिनुबाई` हे नांव कायस्थ जातीत अजूनहि तुरळक परंपरेने चालत आले आहे. बिनुबाई है नाव चिनाब नदीवरून उचललेले आहे. हे उघडच आहे.
चांद्रश्रेणी सोडून या लोकांची वस्ती पुढे काय देशांत उर्फ अयोध्या प्रांतांत झाली. कोकणचे रहिवाशी जसे कोकणस्थ व देशावरचे देशस्थ तसेच काय देशाचे रहिवासी ते कायस्थ, हा सरळ अर्थ आहे. कोंकणस्थ ब्राह्मण पुण्यांत राहू लागल्यामुळे त्यांना पुणेकर हेहि नाव लागू झाले आहे. (पूना ब्रामींस) म्हणजे कोंकणस्थ नव्हत की काय? त्याचप्रमाणे प्रभू लोक चांद्रश्रेणी सोडून काय देशांत आल्यावर `कायस्थ ` बनले, तरी ते ` चांद्रश्रेणीय` का राहू नयेत? सारांश, चाद्रश्रेणीय कायस्थ हे दोन शब्द प्रभू लोकांच्या वसाहतीदर्शक स्थलवाचक शब्द आहेत. आतां राहला `प्रभू` शब्द, प्रभू शब्दांत राजेपणा किंवा राज्यकर्तृत्व आहे आणि ते सिद्ध करणारे ऐतिहासीक पुरावे रगड आहेत. ते यथाक्रम पुढे येतीलच, कायस्थ प्रभू ही एक पोलीटिकल ट्राईब राजकारणपटू जाती आहे. ती चातुर्वर्ण्याच्या किंवा चतुर्वगांच्या कोणत्या दालनांत शोभते हे ठरविण्याचा अधिकार कोणालाच नाहीं. (अशा स्थितीत कायस्थप्रभूंच्याच क्षत्रियत्वासंबंधाने हा आक्षेप पुढे आणणे, आणि त्याला चित्पावनांसारख्या संशयित व वादग्रस्त उत्पत्ति असलेल्या, आणि त्यामुळेंच यांची राजकीय उन्नति होईपर्यंत इतर ब्राह्मण वर्गांनीं कमी दर्जाच्या मानलेल्या पोटब्राह्मण जातीनें महत्व देणे, बरेच चमत्कारिक दिसते." टणत्कार परीक्षण. वि. ज्ञा. विस्तार पृ. १५६ (एप्रील १९१९) श्री. माधवराव लेले, बी.ए.बी.एस.सी.) या जातीनें कलम-समशेरीचा प्रभाव अत्यंत स्पृहणीय सव्यसाचीत्वानें आजपर्यंत गाजवून हिंदु समाजांत योग्य तो दर्जा पटकविलाच आहे. तो दर्जा कवडीमोल ठरविण्याच्या कामी राजवाड्यांचा वेदोक्त-पुराणोक्त, समंत्रक अमंत्रक किंवा अनुलोम-प्रतिलोम वाद फुकट आहे. कायस्थ प्रभू क्षत्रिय की शूद्र, शुद्ध रक्ताचे की अकरमासे हे ठरविण्याचा अधिकार ब्राह्मणांना व या चित्पावनांना दिला कोणी? आजचे कायस्थ प्रभू स्वयंनिर्णयी आहेत. त्यांच्यापुढें राजवाडे किंवा भारत-इतिहास संशोधक मंडळ कोणत्या झाडाचा पाला? विद्वान असाल तर स्वतःच्या घरी दहाच्या ऐवजीं पन्नास भाकरी खा. कायस्थांच्या किंवा कोणाहि इतर जातींच्या कुचाळ्या करण्याची तुम्हांला जरूरी नाही. ज्या ज्या क्षेत्रांत कायस्थांशी दोन हात करण्याची तुम्हांला खुमखूम असेल, तेथें तेथें खुशाल दाना दुष्मन प्रमाणे येऊन उभे रहा. आम्ही कायस्थ प्रभू तुम्हालाचसे काय, तुमच्या सर्व वंशजांनाहि पुरून उरू यहुदी तर यहुदी आणि प्रत्येक खटल्यांत वादी!
अव्यापारेषु व्यापार
करण्यांत राजवाडे आणि त्यांचे मंडळ यांनी मिळविलेला लौकीक आतां तरी अखिल महाराष्ट्राच्या पूर्ण माहितीचा झालेला आहे. संशोधनाच्या सबबीवर एक जीर्ण पातडें छापतात काय, त्यावर मल्लीनाथी करतात काय, आणि प्रत्यक्ष मजकुराचें क्षेत्र सोडून, कायस्थ प्रभूंच्या सर्वच इतिहासावर एखाद्या माथेफिरूप्रमाणे भरंसाट आग पाखडतात काय! विशेष आश्चर्याची गोष्ट हीच की राजवाड्यासारख्या एककल्ली माणसानें कांहीहि भरंसाट पिसाट खरडलें तरी मंडळासारखी जबाबदार संस्था तें बिनदिक्कत छापून प्रसिद्ध करते. या पुस्तकाची १ ली आवृत्ति निघून ६ वर्षे झाली.
इतक्या वर्षांनी जरी कोणी राजवाड्यांचा मूळ निबंध वाचला, तरी त्यातल्या बेजबाबदार विचारसरणीची, कायस्थ ज्ञातीवर झुगारलेल्या अपमानास्पद क्षुद्र विधानांची व बिनबुडाच्या भयंकर आरोपांची नांगी त्याला पूर्वीपेक्षाहि अधिक तीव्रतेने दंश केल्याशिवाय राहणार नाही. आजचे कायस्थ समंत्रक अमंत्रक पुण्याहवाचनावर किंवा वेदोक्त पुराणोक्तावर रुसले नाहीत त्यांना त्यांची फुटक्या कवडीचीहि किंमत वाटत नाही. या बहुमोल मालाची वखार मंडळाला खुशाल आमरण बहाल असो. परंतु धर्माधिकारांची चर्चा करता करता राजवाडयांनी म्हणजेच मंडळाने इतिहासदृष्ट्या कायस्थ प्रभू समाजावर जे घाणेरडे आरोप करण्याचे धाडस केले आहे. त्याला कायमचे सणसणीत प्रत्युत्तर देऊन मंडळाचा पाजीपणा जनतेच्या व सरकारच्या नजरेला आणून देणे आमचे कर्तव्य आहे. पिसाळलेले कुत्रे एकाला चावले की, पुढे शेकडो जणाना डसल्याशिवाय रहात नाही, त्याची कवटी फोडून त्याला मोक्षच द्यावा लागतो. धर्मदीपाची लावणी लावतां लावतां कायस्थांच्या सर्व इतिहासाला काळे फासण्याचे कारण राजवाडे देतात की "वाद (?) वरवर उपचार करून मिटण्यासारखा नाही. त्यांच्या
मुळाशीच हात घातला पाहिजे."
गोष्ट खरी. आजपर्यंत भिक्षुकशाहीने प्रत्येक ब्राह्मणेतर समाजाच्या मुळाशीच हात घालून त्याला निर्माल्यवत् बनविल्याची पुण्याई कमाविली आहे. मग कायस्थ प्रभूध अपवाद कसे ठरतील? उलट, ब्राह्मणांच्या जुलमी घाशीरामीचा भार अखिल ब्राह्मणेतरांपेक्षा कायस्थ प्रभूंवरच विशेष पडलेला आहे. याला कारण कायस्थांची वरचढ बुद्धिमत्ता व ब्राह्मणांना पदोपदी चैचणारी राजकारण- कुशलता चालू घटकेला सुद्धा पुणेरी चित्पावनांच्या डोळ्यांत खुपणारें प्रत्येक क्षेत्रांतलं- जबरदस्त शल्य जर कोणते असेल तर ते कायस्थ प्रभूच होय. हे शल्य कोणत्या उपायानी कायमचे उखडले जाईल, हा एक मोठा बिकट प्रश्न चित्पावनांपुढे गेली दोनशे वर्षे पडला आहे. हीच विवंचना राजवाडे अशी मांडतात:- `कायस्थ समाजाला वेदोक्तसंस्काराचा अधिकार कसा द्यावा, हा प्रश्न गेली दोन अडीचशे वर्षे ब्राह्मण व क्षत्रिय समाजास पडला आहे. हा सामाजीक प्रश्न सुटत असताना, (१) संभाजीचा वध झाला, (२) नारायणराव मारला गेला आणि (३) प्रतापसिंह पदभ्रष्टता पावला. पृ. ४३. राजवाड्याच्या समग्र निबंधदीपाचा अगदी थोडक्यात सारांश काढावयाचा तर शिवकालापासून आजपर्यंत (?) हा जो
कायस्थ ब्राह्मणांचा झगडा
चालला आहे, त्याचे अंतरंग काय आहे? पू. ३९ हे मोठया चतुराईने शोधून काढण्याच्या " भरात त्यांनी उपलब्ध सर्व इतिहासांना फासावर चढवून कायस्थ प्रभू समाजावर खालील ठळक आरोप केले आहेत. आम्ही फक्त ऐतिहासीक मुद्यांपुरतेच आमच्या प्रत्युत्तराचे क्षेत्र मर्यादित केलें आहे. कायस्थांच्या उत्पत्तीविषयी, रक्तशुद्धीविषयी व शूद्रत्वाविषयी राजवाड्यांनी काढलेल्या चित्पावनी प्रलापांविषयी आम्ही काही लिहू इच्छित नाही. गांवभवानीच पातिव्रत्याचा दिमाख मिरवू लागली तर तिच्या बाजारबसवेपणाबद्दल कोण घासाघीस करू इच्छील?
कायस्थांवरील आरोप
(१) संभाजीचा खून व तत्कालीन क्रांति कायस्थांमुळे घडून आली.
(२) नारायणराव पेशव्याच्या खुनांत कायस्थ प्रभूचें आंग होते.
(३) सातारच्या महाराजांच्या वतीनें दुसऱ्या बाजीरावाच्या विरुद्ध इंग्रजांशी खटपटी करणारे कायस्थ प्रभूच.
४) सातारकर छत्रपति प्रतापसिंह याच्या पदनष्टतेला मूळ कारण कायस्थ प्रभूच
असे ठळक चार आरोप करून, राजवाड्यांनी, पर्यायानेच नव्हे तर विशेष स्पष्टतेनें,
कायस्थ स्वराज्यद्रोही आहेत
हे ठरविण्याचे पुण्यकार्य केलें आहे व या शतकृत्याचा वाटा आपणांस मिळावा म्हणून श्रीमंत सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे व दत्तो वामन पोतदार या दोघा ग्रॅज्यूएटांच्या मार्फत भा. इ. सं. मंडळाने राजवाडयांच्या हाताला हात लावला आहे.
महाराष्ट्राच्या भवितव्यतेची रात्रंदिवस काळजी करून करून झुरणीस लागलेल्या राजवाड्यांना वेदोक्तांच्या खटपटी उकरून काढणाऱ्या कायस्थ प्रभूंच्या चळवळींची इतकी जबरदस्त दहशत पडली आहे की या खटपट्यांचा एकदा कायमचा निकाल लावून टाकण्यासाठी, अगदी उठवणीस आल्याप्रमाणे, ते सर्व आब्राह्मण चांडाळ महाराष्ट्रीयांची काकुळतीने विनंती करतात :
“कायस्थांची जातिधर्मोन्नति करण्याच्या कामांत तडजोड न झाल्यामुळे स्वराज्यास आपण मुकलों. आतां एकवर्णाच्या वावटळीत समंजसपणे वाट न काढली, तर आपण हिंदु समाजासहि गमावून बसूं.” पृ. ४९.
इतक्या बेजबाबदार आरोपाचा प्रतिकार नुसत्या लेखनशक्तीने होने नाहीं. वास्तविक येथे पैजारांचे काम, असली बेअब्रूकारक व अपमानास्पद विधाने बेधडक इतिहासाची साधनें म्हणून प्रसिद्ध करणाऱ्या मंडळातले लोक एक तर अस्सल पागल असले पाहिजेत किंवा बिलंदाज कटवाले असले पाहिजेत. याच चित्पावनी धोरणाने महाराष्ट्राचा इतिहास घडणार असेल, तर तो कोणत्या वळणावर जाणार याचें भविष्य करायला ज्योतिषशास्त्र शिकले पाहिजे असें नाहीं. मंडळाच्या या बेजबाबदार आरोपाचा समारोपांत विस्तृत समाचार घेणेंच बरें. तत्पूर्वी राजवड्याच्या इतर आक्षेपांचा यथाक्रम विचार करू. प्रथम कायस्थ ब्राह्मणांचा झगडा ही मोठी खुबीदार शब्दयोजना करतांना, त्यांतील ‘ब्राह्मण’ शब्दाच्या व्याखेत राजवाडे कोणाचा समावेश करूं पाहतात? पेशवाई सत्तेच्या जोरावर कित्येक गबाळ देशस्थ व लोभी कऱ्हाड्यांशी जबरीचे मिश्रविवाह ठोकून, गेल्या १५० वर्षात उत्क्रांतीची शर्यत अत्यंत स्पृहणीच वेगानें जिंकणारा राजवाड्यांचा चित्पावन समाज आज स्वतःस जरी ब्राह्मण म्हणवीत असला, तरी त्याचा लौकीकी ब्राह्मणपणा अझुन अखिल हिंदु जनांस सारखाच मान्य झालेला नाहीं. इतकेंच नव्हे, तर अलोट विद्वता किंवा चित्तपावनता ( अथवा राजवाड्यांच्या विश्वामित्री व्युत्पत्तीत बोलायचे तर क्षितिपावनता ) आंगी असणारा एकहि चित्पावन शंकराचार्याच्या गादीवर बसण्यास का पात्र मानला जात नाहीं. या प्रश्नाच्या उत्तरांतच चित्पावनांचा ब्राह्मणपणा भाडोत्री ठरत आहे.(या गोष्टीबद्दल पुण्याचें विद्वान् ‘आचार्य’ कते ता. २५ मे १९१५ च्या अंकात उद्वार काढतात :-
" २. आचार्याच्या पहिल्या वर्षाच्या सोळाव्या अंकात प्रो. भानु करवीर पीठाच्या जगद्गुरूचे सर्वाधिकारी झाले, हे वर्तमान आम्ही अभिनंदनपूर्वक प्रसिद्ध केले होते, पण त्या बहुमानाच्या व किफायतशीर पदावर त्यांना फार दिवस रूढ होता आले नाहीं, हे कळविण्यास आम्हाला अतिशय खेद होतो. आम्ही तर अशीही आशा करीत होतो की ‘चंचुप्रवेशे मुसलप्रवेश:’ किंवा भटाला दिली ओसरी या न्यायाने आता आमच्या कोंकणस्थांना `जगद्गुरू` होण्याचाही मान लवकरच मिळेल! कारण हे प्रगतिप्रधान सर्वाधिकारी देशस्थानेंच संकेश्वरच्या पीठावर बसले पाहिजे. कोकणस्थ स्वामींचा त्या पीठाला स्पर्शही होता कामा नये; असल्या अनुदार कल्पनांना फार दिवस टिकू देणार नाहीत. फार काय पण प्रसंग पणल्यास ते स्वतः संन्यासदीक्षा घेऊन जगद्गुरूचे पीठ सुशोभित करतील व विलायतेस जाऊन आचार्यांचे जगद्गुरुंत्व सार्थ करतील, अशी आम्ही बळकट आशा करीत होतो. पण चार-सहा महिन्यांच्या आतच ती निष्फळ झाली. हे आम्हा कोंकणस्थांच्या दैवदुर्विलासाचेंच स्पष्ट चिन्ह आहे.) ते काहीहि असले तरी आम्ही स्पष्ट विचारतों की शिवाजीच्या वेळी हे ऊर्ध्वबुद्धी चित्पावन होते कोठे? शिवकालापासून तो परवाच्या कं. न्या. रानड्यांच्या ‘मराठी सत्तेचा उत्कर्ष’ पर्यंतचे सर्व जुने नवे लेख कागदपत्रे बखरी, पाश्चात्य फिरस्त्याच्या रोजनिशा गाळून चाळल्या. किंवा मंडळाच्या अगर राजवाड्यांच्या घशांत कोळून कोळून पाजल्या, तरी एक गोष्ट स्पष्ट सिद्ध आहे की शिवाजीच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात एकाहि चित्पावनाच्या रक्ताचा थेंब खर्ची पडलेला नाही. स्वराज्यस्थापना हे चित्पावनांचे ब्रीदच नव्हे, मागे नव्हते व पुढे असणारहि नाही
आजहि हिंदी स्वराज्यविषयक चळवळीचे सूक्ष्म निरीक्षण केल तरी त्यातही चित्पावन खटपट्यांची तळमळ
पेशवाई पाट्यावरवंट्याचा जीर्णोद्धार
करण्यासाठीच आहे. शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याची प्राणप्रतिष्ठा कायस्थ प्रभूंच्या रक्तावर झालेली आहे आणि त्या स्वराज्याचा प्राण घेऊनच चित्पावनानी आपली प्रतिष्ठा वाढविली आहे, हा ऐतिहासिक पुरावा खोडण्यासाठी राजवाड्यांना मंडळाला किंवा अखिल चित्पावनांना आपल्या बेचाळीस पिढ्यांची पुण्याई खर्ची घातली तरी पुरणार नाही. ‘सातारकर छत्रपति महाराजांची बखर’ नामक शिळा छापाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या वेळच्या सर्व लहान मोठ्या राजकारणी पुरुषांची जी लांबलचक यादी खाते-प्रकरणशः छापलेली आहे, त्यांत एक चित्पावन औषधालासुद्धा सापडत नाही मग हे शिवकालापासून कायस्थांशी झगडणारे ब्राह्मण कोण? आता, ब्राह्मण म्हणजेच चित्पावन अशीच जर राजवाड्यांची
घाशीरामी व्युत्पत्ती
असेल तर मग कोणाचा तेथे काय इलाज? शिवकालात चित्पावनांचे राजकारणी अस्तित्व सिद्ध करण्यासाठी राजवाड्यांच्या व मंडळाच्या काय काय धडपडी सुरू आहेत, त्या आम्हाला पूर्ण माहित आहेत. याचे एक नमुनेदार उदाहरण देतो. राजवाड्यांनी नुकताच एक ‘राधामाधवविलासचंपू काव्य’ नामक ग्रंथाचा जीर्णोद्धार केला. त्यात शहाजी राजांच्या तंजावर येथील राजवैभवाचे कादंबरीच्या धाटणीवर काही वर्णन असून त्यांच्या प्रभावळीतील काही ठळक व्यक्तीची नांवे आहेत. या नावांची व्युत्पति लावून त्यांची नातीगोती शोधण्यात राजवाड्यांनी आपल्या संशोधकी अकलेला दिलेले तणावे हास्यास्पद असले तरी मनोरंजक वाटतात, त्यांत एक नांव अभेद गंगाधर असें आहे. यावर राजवाड्यांनी ठरविलेली व्युत्पति पहा :- “अभेद अभयद - अभयंकर अभ्यंकर, हा अभेद गंगाधर चित्पावन होता.” झाले काम. शहाजींच्या दरबारांत चित्पावनाची प्राणप्रतिष्ठा करतांच, शिवकालीं चित्पावनांचे अस्तित्व सिद्ध केलेंच की नाही? आमची राजवाड्यांना अशी सूचना आहे की असले बाष्फळ व्युत्पत्तिप्रदीप पाजळण्यापेक्षां त्यांनी एकदम
ब्रह्मदेवालाच चित्पावनत्वाचा बाप्तिस्मा
यावा की सगळाच वाद मिटला. अभेद गंगाधराचा अभ्यंकर चित्पावन बनविण्यांत काय फायदा? एकदम मुळाशीच हात घातलेला बरा. निर्विकार चित्तानें महाराष्ट्राच्या इतिहासाचे नुसते वरवर अवलोकन करणारालासुद्धा चटकन समजून येईल की श्री शिव छत्रपतींच्या स्वराज्योपक्रमापासूनचा इतिहास घेतला तर सामाजिक व राजकीय प्रदेशांत चित्पावन लोकांचा प्रवेश नानासाहेब पेशव्यांच्या कारकीदीपूर्वी मुळीच झाला नव्हता. " कोकणस्थ ब्राह्मण हे प्रथमतः अगदी मूढ असत व कोंकणांतून फारसे घाटावर येत नसत, आणि देशस्थ लोकहि त्यांस अगदी हलके समजत. याजमुळेच शिवाजीपर्यंत कारभारांत जे मुत्सद्दी लोक होते ते परभु किंवा देशस्थ असत”.ही के. लोकहितवादी देशमुखांची पुराव्याची माहिती आजपर्यंत एकाहि प्रमाणिक संशोधकाला खोटी पाडता आलेली नाहीं. के. न्या. रानडे म्हणतात, "कोकणातील ब्राह्मणलोक मराठी साम्राज्यवृद्धीच्या पहिल्या साठ वर्षात अगदीच पुढे आले नाहीत. " (मराठी सत्तेचा उत्कर्ष पृ. १२१) येणार कोठून! बाळाजी विश्वनाथानंतर (सन १७१४) काही दिवसांनी कोकणची मुलें घाटावर येऊ लागली.ती स्वयंपाक व शागिर्दी करण्यास रहात. (लोकहितवादी) फार काय पण राजवाडे भावे प्रभृतीच्या पोटांत वायगोळ्याप्रमाणे धुमाकूळ घालणाऱ्या बाळप्रभु चिटणीसाचा मुलगा खंडोबल्लाळ, या कायस्थ प्रभूची मेहेरबानी (बाळाजी विश्वनाथला पेशवाई मिळाली ती मुख्यत्वे खंडो बल्लाळच्या खटपटीने मिळाली. ही गोष्ट सर्वांना माहितच आहे याबद्दल प्रभाकर कवीचा पेशवाईवरचा पोवाडा यांतः-
सातारकर पंतनीस मुख्य चिटणीस लेखक नादर । छत्रपति विनवून देवविती श्रीमंतास चादर ॥
असे एक पालुपद आहे. परंतु या पालुपदालाहि अलीकडे आधुनिक संपादक श्रेणीनी ‘कायमचा चाट’ देण्याचे संपादिले आहे.) झाली नसती तर बाळाजी विश्वनाथ उदयास येणें बरेंच दुरापास्त गेले असतें, आणि सारा चित्पावन समाज अखेरपर्यंत ‘हारकारु’ चेंच काम करीत राहिला असता.
नानासाहेब पेशव्याची पेशवाई पदाची निवडणूक गोविंदराव चिटणीसाच्या हुंकारानेच घडून आली. याविषयी उपलब्ध इतिहास इतका स्पष्ट सडेतोड आहे की तो कसाहि उलट सुलट करून वाचला तरी त्यांतून एकच प्रधान तत्व निघत की चित्पावन समाजाच्या उन्नतीच्या मुळाशी प्राध्यान्यें करून चांद्रश्रेणीय कायस्थ प्रभूच आहेत. आजचे राजवाडे किंवा चित्पावन क्रियानष्ट असले, तरी पहिले दोन चित्पावन पेशवे हे तत्त्व कृतज्ञतेनें स्मरत होते. पण पुढील साऱ्या पेशवे नोकरशाहीचा इतिहाच म्हणजे.
खाल्ल्या घरचे वांसे
मोजण्याचा इतिहास झाल्यामुळे चित्पावनांस नैतिक दृष्ट्या निमकहरामपणाचा जो कालिमा लागला तो आजदीनतागायत कायमच आहे. ही कृतघ्नपणाची डांबर पुसून टाकणारा आणि आपल्या जातभाईच्या सनातन वक्र मनोवृत्तीला सरळ रेषेत दाबणारा महात्मा जोपर्यंत चित्पावन समाजात उत्पन्न झाला नाही, तोपर्यंत इतिहास संशोधनाच्या पांघरूणाखाली चित्पावनांना ‘क्षितीपावन’ ठरविणाऱ्या कितीहि व्युत्पत्या कोणी लढविल्या आणि विश्वामित्री धाटणीवर बनावट लेखांचा, टाचणांचा किंवाआक्षेपाचा केवढाही जंगी साठा कालात मुद्रित ठेवला तरी ऐतिहासिक सत्ये ढासळून पडणे कधीही शक्य नाही. अर्थात ज्याला राजवाडे ‘कायस्थ ब्राह्मणाचा झगडा’ असे सामान्य नांव मोठया मुत्सद्देगिरीने देतात, त्याचा खरा
स्पष्टार्थ स्वराज्यनिष्ठ व छत्रपतिनिष्ठ कायस्थ प्रभूंचा निमकहराम पेशवे नोकरशाहीशी झगडा असा आहे. यांत धर्माचा काहीहि संबंध नव्हता. आता नाही व पुढे कदाकाळी अस शक्य नाही. आणि यदाकदाचित असला, असें जरी वादार्थ गृहीत धरले तरी त्याचा निर्णय करण्याचा अधिकार चित्पावनांना केव्हा नव्हता, आता नाही व पुढेहि असणे शक्य नाहीं
शिवकालीन ब्राह्मणांचा कायस्थद्वेष धर्माची भिक्षुकी धाबळी पांघरून जरी पुढे आला होता, तरी त्याचे खरे वास्तविक स्वरूप बाळप्रभू चिटणिसाने तेव्हांच “कारभार संबंधी द्वेष त्यास कामानिमित्त सरकार कल्याणाची चाकरी करून आम्हांस माजी करून हात दाखवावा. तें सोडून ब्राह्मण्यावर येऊन सांगून पाठवितां हे आश्चर्य आहे. हे रिकामे दात खाउन अवलक्षण देणे चांगले दिसत नाही.” या खरमरीत स्पष्टोक्तीने ब्राह्मणांच्या प्रत्ययास आणून दिले होते. अजूनहि कायस्थ चित्पावन चुरशीचे मूळ याच तत्त्वांत आढळते. पण बाळ प्रभूच्या वेळी चित्पावनांचा काहिही संबंध नव्हता.
पुढे, सातारकर छत्रपतींना धाब्यावर बसवून, पुण्यास शनी जरी आपला स्वतंत्र सवतासुभा उभा केला आणि सत्तेच्या जोरावर चित्पावन समाज सर्वच बाबतीत आजच्या गोऱ्या सिविल सर्वटाप्रमाणे भयकर शिरजोर बनविला तरी देखिल इतर महाराष्ट्रीय ब्राह्मण त्याला आपल्या पंक्तीला मुळीच घेत नव्हते. ("The Peshwas were long excluded from eating at tables with any Brahmin of high caste," Ward`s India & the Hindo 08. pp. 199-200.) शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मणाची तर या बाबतीत अझूनहि मोठी तक्रार आहे. चित्पावन पेशवे हे अगदी राजाच्या पायरीला जाऊन भिरण्याइतके अरेराव झाले असतांहि इतर महाराष्ट्रीय ब्राह्मणांनी स्थाना पंक्तीवयवहाराचा प्रतिबंध करावा, ही गोष्ट विशेष चिंतनीय आहे. दुसरा बाजीराव नाशीकला गेला असता तेथील ब्राह्मणांनी त्याला गोदावरीच्या घाटावरील पायऱ्यांना स्पर्शहि करू दिला नाही. (पहा. Hamilton`s Description of India, Vol. II. p. 197) असे शेकडों उतारे देता येतील. सारांश ‘ब्राह्मण’ व्याख्येत चित्पावनांचा बळजबरीचा समावेश करण्याचा राजवाड्यांचा उपद्व्याप सर्वस्वी लंगडा आहे. राष्ट्रीय भावनेचा नाटकी आंव आणणाऱ्या राजवाडयांनी आपल्या विवेचनांत खालचे ब्राह्मण, वरचे ब्राह्मण, गांवगन्ना ब्राह्मण वगैरे बऱ्याच नवीन ब्राह्मण जातीच्या जनकत्वाचा मान स्वतःकडे घेतला आहे. पण या पोकळ वादांत शिरण्याचे आम्हाला काहीच प्रयोजन नाहीं.
ऐतिहासिक वादाची सुरुवात राजवाडे येणेप्रमाणे करतात:- " शक १५५० च्या पूर्वीचा महाराष्ट्रांतील चांद्रसेनीय कायस्थांचा सामाजिक, धार्मिक, राजकीय असा कोणताच दस्तऐवजी इतिहास उपलब्ध नाही. हे लोक महाराष्ट्रांत केव्हा व कोणत्या राजाच्या आश्रयाने प्रथम उतरले, तें कळण्यास नक्की साधन नाही. शके १५७० च्या सुमारास बाळाजी आवजीस चिटणीशी मिळाल्यापासून त्यांचा इतिहास कळण्यास प्रारंभ होतो. तत्पूर्वी सर्व अंधार आहे.” अंधार आहे की पहाणारांचे डोळेच फुटले आहेत? सदरहू विधान अत्यंत धाडसी, दांडगाईचें आणि जाणून बुजून लोकांच्या डोळ्यांत धूळ फेंकणारे आहे.
`महाराष्ट्रांतील हा शब्द ठळक ठशाने छापण्यांत राजवाड्यांचा काय हेतु? चित्पावनांप्रमाणे कायस्थ प्रभू अवचित बळजबरीनें हिंदूत घुसले, का अकल्पित आकाशांतून खाली पडले, का एकदम अस्पृश्यांचे स्पृश्य झाले, जनावरांची माणसें बनले, झाले तरी काय? किंवा सन १७१४ पूर्वीचा चित्पावनांचा कसलाच इतिहास उपलब्ध नाही, हे शल्य त्यांच्या हृदयांत रात्रंदिवस सलत असल्याप्रमाणे, ‘माझ्यासारखी कधी होशील’ एवढ्याच उद्देशाने जाणून बुजून हा विपर्यास ते करीत आहेत? `महाराष्ट्रातील` या शब्दांवर ते विशेष जोर देतात, तर सन १६२८ पूर्वीचा कोणकोणत्या महाराष्ट्रीय हिंदू जातींचा दुब्बेबाज आणि स्पष्ट इतिहास आज त्यांच्यापाशी उपलब्ध आहे? महाराष्ट्र हे सर्व हिंदू अलीकडचे वसतिस्थान आहे.
"It will thus be seen that neither Shivaji, whose family came from Rajputana, nor the Peshvas, who came from Egypt, nor the Prabhus who came from the valley of the Chinab in Kashmere and Panjab via Oudh and Dalbhum, are the original residents of the tract they now claim as their Native Land." (Grant Duff, Supplement.)
`प्रभू` शब्दाची व्युत्पत्ति ठरवितांना कै. राजाराम रामकृष्ण भागवत या निस्पृह संशोधक गृहस्थानें (विविधज्ञान विस्तार पु. २५ अंक ९-१० पु. २०९ सन १८९३) चां. का. प्रभू ही सर्वात अत्यंत जुन्या वस्तीची जात आहे हे सिद्ध करताना " लेखणीचे अधिकारी कायस्थ प्रभू हा वटवृक्षाचा अस्सल व जुनाट दांडा असून, ब्राह्मणत्वाची शेखी मिरविणाऱ्या दरोबस्त जाती त्यासच फुटलेल्या पारंब्या होत." हे उद्गार काढलेले काय राजवाडे प्रभृतीना माहीतच नाहीत? बाळाजी आवजीचे वडील आवजी हरी, आजे हरी रामाजी व पणजे रामाजी श्रीरंग हे सर्व जंजीऱ्याच्या हबशाचे दिवाण होते व जंजीरा म्हणजे त्या वेळी कायस्थ प्रभूचा एक `स्ट्रॉगगोल्ड` होता, हेहि जर या खंद्या संशोधकाला दिसत नाही, तर त्यांनी संशोधन दृष्टीची वृथा घमेंड तरी मारू नये. इतिहास संशोधनाच्या काम काळ्याचे पांढरे केस केलेल्या राजवाड्यांनी इतकें बाष्कळपणाचें विधान करावें आणि तें मंडळाच्या कार्यकारी सभासदांनी डोळे मिटून छापून काढावे, यांत मूर्खपणाचा अधिक चांटा पत्करण्याचा मान कोणाकडे जातो, हे ठरविणे कठीण आहे.
काशी ते रामेश्वर ऐतिहासिक साधनें हुडकण्यासाठी कंबर कसून नेटानें प्रयत्न करणाऱ्या या मंडळाला सन १६२८ पूर्वीचा कायस्थ प्रभूंचा उपलब्ध इतिहासच नेमका दिसू नये, हा खेळ मंडळाची इतिहास-संशोधकी नालायकी सिद्ध करीत असला, तरी आम्हांला अत्यंत विषादकारक वाटतो. राजवरील विधान मंडळाच्या बृहस्पतिसेनेपुढें वाचतांच `याला कांही आधार आहे का? या ज्ञातीचा उपलब्ध इतिहास तुम्ही विचारांत घेतला काय? असा सवाल करण्याची अक्कल एकाहि सभासदास होऊ नये, हा त्यांच्या मतिमंदतेचा पुरावा मानावा की कायस्थ प्रभूंच्या जाहीर बदनामीचा पुरस्कार मानावा?
मराठी स्वराज्यस्थापनेच्या भर उषःकाळी ज्या कायस्थ प्रभु समाजाने न भूतो न भविष्यात अशी राष्ट्रसेवा करण्यात शेकडों उमलत्या जवानांची(Blooming flowers of the race) आहुती दिली. ती त्याच्या बलवत्तर प्रबुद्ध पूर्वसंस्कृतीच्या अभावी नुसत्या यदच्छेनें कधितरी देता आली असती काय? शिवउदयापूर्वी चां. का. प्रभू जर अंधारात होते. त्यांच्या क्षेत्रबीजाचा किंवा कुळामुळाचा कोठेच मागमूस नव्हता. तर ते शिवाजीच्या स्वराज्यीपक्रमाच्या धाडसी कल्पनेला पाठबळ देण्यास समाजशः धाऊन आलेच कसे? मागासलेल्या जाती उन्नतीची शर्यत अशी अबधित जिंकू शकत नसतात, हेहि या समाजशास्त्रकोविदाला कळू नये काय? इतर जातीप्रमाणेच चां. का. प्रभू ज्ञातीबद्दल अत्यंत कसोशीची चौकशी मिळविण्यासाठी इंग्रज सरकारने मागे कमिशन नेमली होती. त्यांनी अनेकांच्या शिलालेखांच्या ताम्रपटांच्या सहाय्याने अनेक साक्षीदारांच्या कसून तपासण्या घेतल्या चालीरीतीचा, रूढी रिवाजांचा तपशील मिळविला. तो सरकारी संशोधकाकडून तपासून घेतला आणि ‘एथ्नोग्राफिकल सर्वे’ नामक ग्रंथांत व इतर गॅझेटियरात सरकारमार्फत प्रसिद्ध झालेलाच आहे. याशिवाय या ज्ञातीची विश्वसनीय माहिती देणारी अनेक लहान मोठी मराठी संस्कृत व इंग्रजी पुस्तकें व मासिक प्रसिद्ध झालेली आहेत.
चित्पावनांच्या वर्तमान बुद्धिवैभवाची झकाकी इंग्रेजी सरकारच्या हाडवैरावर तगलेली असल्यामुळेच जर सरकारी ग्रंथातील माहिती अविश्वसनीय मानण्याची मंडळाची प्रवृत्ति असेल, तर त्याच त्रयराशिकी नियमाने या चित्पावनी मंडळातर्फे प्रसिद्ध होणारी दिव्य बाडे चित्पावनेतर दुनियेने खोटी का मानू नये? राजवाडे किंवा मुंबई सरकारचा ५०० रुपयांचा मलिदा दरसाल हबकणारे भा. इ. स. मंडळ यांनी चां. का. प्रभू ज्ञातीच्या इतिहासाच्या अज्ञानाचे जे ढोंग पांघरले आहे, त्या ढोंगाचे भूत इतिहास प्रसिद्ध हाडवैराच्या पिंडावर पोसलेले आहे. हे कोणाहि चाणाक्षाच्या लक्षांत तेव्हाच येईल. अर्थात बळेंच आंधळ्यांचे सोंग घेतलेल्या या मंडळाला आम्ही काय काय म्हणून दाखविण्याचा यत्न करावा? उपलब्ध असलेले पुरावेहि न पहाण्याइतके जे अरेराव तुसडे आणि उर्मट बनलेले आहेत. त्यांनीच साऱ्या भरतखंडाच्या अनुपलब्ध ऐतिहासिक सामुग्रीच्या संशोधनाची घमेंड मारावी, हे. दृश्य अस्सल पेशवाई नव्हे असे कोण म्हणेल?
मंडळाला रातांधळे लागलें
असले तरी शक १५७० पूर्वीच्या अंधारातहि कायस्थ प्रभूंच्या अस्तित्वाचा नव्हे. राजकारणी प्रभुत्वाचा काही शोध लागल्यास पाहिले पाहिजे चांद्रश्रेणीयांची वस्ती काश्मिरात होती, हे वर सांगितलेच आहे. तेथील इतिहासांत या लोकाबद्दल पुष्कळ माहिती मिळण्याचा संभव आहे. राजतरंगिणी हे सुप्रसिद्ध काव्य काश्मिर नृपतीचा महाअमात्य चंपकप्रभू याचा मुलगा कल्हणप्रभू (शके १०९१ - ११६९) याने लिहिले आहे. सन १३१८ च्या सुमारास गुप्त (गुप्ते) राजाची सत्ता प्रस्थापित झाली. त्यावेळी चां. का. प्रभूतील गुप्ते, राजे, प्रधान, चौबळ, रणदिवे, दळवी, ठाकरे ही घराणी उदयास आली.
शके १३४७ मध्ये नारायण चौबळ मुर्तुजाबादचे देशपांडे व गांवकुळकर्ण उपभोगीत होता. दौलताबादचा नवीन तख्ताधिपति अहमदशहा बहामनी याजकडे याच साली तो नजराणा घेऊन गेला होता. याचा मुलगा गोविंद चौबळ याच अल्लाउद्दीन बहामनी याने कोकण व मावळ प्रांतांत `चीफ इंजिनियर` नेमले होते. व शके १४७० मध्ये खाजेखानाबरोबर त्याला कर्नाटकाच्या स्वारीलाहि पाठविले होते त्याचे पुढील पुत्रपौत्र नारायण, कृष्णाजी व गोविंद या सर्व पुरुषांनी हैदराबादेस हजार स्वारांची सरदारी केलेली आहे. (पहा चां. का. प्र. इति हासाची साधने अंक १२) येऊन येथे सापडलेल्या एका शिलालेखाचा फोटोग्राफ रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये (पृ.१ पृ १.३५) छापला आहे. तो सन १०८८ चा असून, त्यात बेलजीप्रभूचे नांव खोदलेले आहे. शिलहार राजा अपरादित्याच्या वेळचा सन ११८२ चा दुसरा (ज्यांना हल्ली देशपांडे म्हणतात ते पूर्वी ‘देशपंडित’ किंवा ‘पंडित’ या संज्ञेने ओळखिले जात असत व त्यांचा व्यवसाय जमीन महसुलाचा हिशेब ठेवणे व लेखनवृत्ती हा असे)
एक शिलालेख सापडला आहे. त्यांत अनंतजी प्रभू सहासष्टी (साल्सेट-साष्टी) परगण्यावर गव्हर्नर होता, असा स्पष्ट उल्लेख आहे. हा शिलालेखसुद्धा वालिग पंडित (हा शिलालेख वाचतांना डॉ. भांडारकर यांनी बऱ्याच चुका केलेल्या आहेत. या शिलालेखाचा अस्सल फोटो आमच्या संग्रही आहे. त्याचप्रमाणे मि. बॅथेन साहेबांनी त्याचेच अधिक काळजीपूर्वक केलेले वाचनहि आमच्याजवळ आहे. त्यावरून पाहता डॉक्टरसाहेबांनी ‘अनंतजिप्रभु’ हा शब्द वाचतांना त्यांतल्या जि अक्षराची पै बनवून अनंतप्रभूला सारस्वत बनविले. परंतु ही चूक आहे. जे कोणी याच शिलालेखांतील प्रारंभीच्या दुसऱ्या ओळीतील ‘विराजित’ शब्दातली जि अनतजिप्रभु शब्दातल्या जिशी ताडूत पाहील त्याला डॉ. साहेबांची चूक समजून येईल. वास्तवीक डॉ. सा. नी. हा शिलालेख अत्यंत अशुद्ध रीतीने वाचलेला आहे हें मि. बँथेनच्या वाचनावरूहि स्पष्ट सिद्ध होत आहे.) नामक कायस्थ प्रभूनेंच लिहिल्याचा त्यांत उल्लेख आहे.
ज्या सह्याद्रीखंडात कायस्थ प्रभूंची माहिती आहे तो ग्रंथ इ. स. १० व्या शतकाच्या सुमारास लिहिला गेला असावा, असा विद्वानांचा निर्णय आहे. शिलहार वंशीय राजा हरपाळ याने एका ब्राह्मणाला दानपत्र दिले आहे. त्यात त्या राजाचा प्रधान लक्ष्मणप्रभु असल्याचा उल्लेख आहे. रजपूत राजा राणा लक्ष्मणसिंह याने चितोड येथे जो एक जयस्तंभ उभारलेला आहे. त्यावर हल्लीच्या सातारकर चिटणीसाचा पूर्वज श्रीपतप्रभू यांच्या नावाचा उल्लेख आहे आणि या गोष्टीचा दुसरा पुरावा चिटणीसांच्या संग्रही असलेल्या वंशवृक्षादि दस्तऐवजातहि सापडतो.
सन १२९५ त अल्लाउद्दीनने मांडवगडचे राज्य उध्वस्त केल्यामुळे तेथील शेकडों कायस्थांची घराणी चितोड व त्याचा आसमंत प्रदेश सोडून, कोकणात व मावळांत आपल्या पूर्वी वसलेल्या जातभाईंना येऊन मिळाली. याशिवाय मुंबई सरकारने प्रसिद्ध केलेल्या `मोनोग्राफ नं. ४ कायस्थ प्रभू` या पुस्तकांत असे म्हटले आहे . - ( मराठी भाषांतर) चेऊल व इतर ठिकाणी सांपडलेल्या दोन शिलालेखांवरुन असे दिसतें की कोकणांत शिलहार राजे राज्य करीत होते त्याकाळी कायस्थ प्रभू येथे वसतीला येऊ लागले. देशपांड्यांच्या वतनांवरून असे सिद्ध होते की ती वतने त्यांनी, दक्षिणेत बहामनी राज्यसत्ता स्थापन होण्यापूर्वीच, मिळविली आहेत. यावरुन असा निष्कर्ष निघतो की या जातीच्या पूर्वजांची वसाहत कोंकणांत व मावळात १०-११ व्या शतकात झाली. तेव्हापासून ते येथेच स्थाईक झाले व पुढ मराठी स्वराज्यात त्यांनी फार महत्त्वाचा भाग घेतला.
(पृ.७) मुसलमानी अमदानीतसुद्धा या ज्ञातीतील अनेक पुरुषांनी त्या त्या सरकारच्या राज्यव्यवस्थेत मोठमोठी हुद्याची कामे केल्याचे दाखले ठसठशीत ठशात प्रसिद्ध झालेले आहेत. मोनोग्राफात आणखी असे म्हटले आहे की " दक्षिणेत मुसलमानी सत्तेचा प्रादुर्भाव होऊ लागल्यापासून चां. का. प्रभूंचा इतिहास सहजगत्या सुरळीत शोधता येतो. दिवाणी आणि लष्करी खात्यात या लोकांनी अनुपमेव कर्तबगारीची कामे केली. देशमुख देशपांड्यांची पूर्वापार वतनें पुढे चालविल्यामुळेच देशांत मुसलमानांना शांति राखता आली. १३९६ च्या भयंकर दुष्काळानंतर वसाहती वाढवून देशांत सुव्यवस्था राखण्याच्या कामी देशमुख देशपांड्यांनी बहुमोल कामगिरी केली. यावेळी डोंगराळ प्रदेशांतील बंडखोरांची बंडे मोडण्यासाठी त्यांना लष्करी नोकरीहि करावी लागली. बेदरच्या बादशहाने या देशमुख देशपांड्यांच्या मदतीला सन १४२९ व मुल्कउल्तिज़ार याला सैन्यासह पाठविले होते. या कामाबद्दल त्यांना मोठमोठ्या मानाच्या पदव्या मिळाल्या, त्या त्यांचे वंशज आजपर्यंत उपभोगीत आहेत. आतोण्याचे प्रभू देशमुख यांना अभंगराव, नात्याचे प्रभु देशमुख यांना सरजेराव, मावळच्या प्रभु देशपांड्यांना आदरराव अशा रीतीने दक्षिणेतील मुसलमानी राज्यकारभारांत प्रभु मोठमोठालील महाडचे नाटकर, नाते निजामपूरचे देशमुख, मावळांतले वैद्य आणि दिघे, आणि इतर पुष्कळ देशपांडे व कुलकर्णी यांच्या सनदा अनेक ऐतिहासिक सत्यांचा निवाडा करण्यास समर्थ आहेत. सन १४२६ त बेदरच्या बादशहानें वाजसनेय बाह्मणांना दिलेल्या एका सनदेत परशराम प्रभु कर्णिक या दरबारी सरदाराचा उल्लेख आहे ब्राह्मणा ब्राह्मणातले तंटे निवडण्याच्या कामावर त्याची नेमणूक होती. " (पृ. ७-८) असे आणखी किती तरी पुरावे राजवाड्यांना व मंडळाला दाखविता येतील. सारांश, शके १५७० (सन १६४८) पूर्वी राजवाडे म्हणतात त्याप्रमाणे सर्व अंधार नसून सर्व प्रकाश आहे. चित्पावनी डोळयांना दिसला नाहीं तर तो दोष डोळयांचा व हृदयाचा आहे.
ब्राह्मण म्हणजे हिंदुधर्माचे डबोल्यावरचे भुजंग अखिल हिंदुजनांच्या सामाजिक धार्मिक आचारविचारांचे सोल एजंट किंवा वेदोक्ताच्या पंढरीतले बडवे. ही राजवाड्यांची जन्मप्राप्त समजूत असल्यामुळे त्यांनी पुढे ग्रामण्यांचा विषय चर्चेला घेऊन त्यावर चित्पावनी जजमे ठोकली आहेत पैकी पहिले :--
”मंत्रवदुपनयाचा आग्रह बाळाजी आवजीच्या पुढारपणाखाली प्रथम (?) शिवाजीच्या कारकीर्दीच्या शेवटास बाळाजी आवजीची मंत्रवदुपनयना संबंधाने फिर्याद शिवाजीने आपला पुत्र जो संभाजीराजा त्याजकडे सोपविली असा उल्लेख सापडतो. (कोठे?) संभाजीनें चांद्रसेनीय कायस्थ क्षत्रिय नाहीत. व मंत्रवदुपनार्ह नाहीत असा निकाल दिला.”
श्रोत्यांना रंजविण्याकरितां हरदासबुवा जशी वडाची साल वांग्याला लावून कित्येक स्वकपोलकल्पित गोष्टी शक्याशक्यतेची पर्वा न करता बेधडक सांगतात, त्या हरदासी गोष्टीच्याहि तोंडात मारण्याइतकी हातचलाखी नव्हे, बातचलाखी या उताऱ्यांत राजवाड्यांनी दाखविली आहे, हे त्यांच्या वैऱ्यांनाहि मान्य करावे लागेल.
असली विवेचनपद्धति आणि ऐतिहासिक गोष्टी हरदासी घाटणीनें दडपून ठोकण्याची राजवाड्यांची उलटी छाती पाहिली की ते कादंबरीकार होण्याऐवजी इतिहाससंशोधनाच्या फंदांत चुकून कसे पडले, याचे कोणी प्रथम संशोधन करील तर बरे असे आमच्याप्रमाणे इतरांनाहि वाटल्याशिवाय रहाणार नाही. शिवाजीच्या राज्याभिषेक प्रसंगी दक्षिणी ब्राह्मणांनी जी आपल्या
अकलेची धूळवड शेणवड
खेळली आणि बाळप्रभू चिटणिसादी कायस्थ प्रभूंच्या धोरणी डावपेचांची सज्जर जोडेपैजार खाल्ली, त्यांचे शल्य विद्यमान ब्राह्मणबुवांना रात्रंदिवस डांचत असतें. अलीकडे दरसाल होत असलेल्या शिवजयंत्युसव आणि राज्याभिषेकोत्सवांच्या प्रसंगी तर हे भिक्षुकी पाप ठळक रीतीनें ‘राष्ट्रीय’ चित्पावनांना आंतून खवखवत असते. हे पाप एकदा कसेंबसें कायमचे गाडावे आणि शिवकालीन भटांचा हा महारोग कायस्थांच्या टाळक्यावर लादावा, याविषयी राजवाडेप्रभूती मंडळभगतांचे जारी प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्नांबरोबरच
कायस्थ मराठ्यांत फाटाफूट
पाडण्याचा कावा अगदी उघड माथ्यानें चालू आहे. आणि कित्येक अकलमंद मराठे या काव्याला बळीहि पडत आहेत. `ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास` अखिल महाराष्ट्रापुढे आम्ही सन १९१९ सालींच ठेविला असल्यामुळे प्रस्तुत ग्रंथाच्या या द्वितीयाऽवृत्तीत आम्ही तपशीलाचा संकोच केला तरी चालण्यासारखे आहे. शिवाजीचे व अखिल मराठ्यांचें क्षत्रियत्व शिवकालापूर्वीहि सर्व भिक्षुकांना मान्य होते. पण या नाठाळ कायस्थ खटपट्यांमुळें तो इतिहास विकृत झाला व सज्जन भिक्षुकशाही विनाकारण दोषी ठरली. वास्तविक खरे शूद्र है लडभडे कायस्थ यांना मंत्रवदुपनयाचा अधिकार नाहीं.
मराठे खरे क्षत्रिय, त्यांच्याविषयी किंवा शिवाजीविषयी अथवा शिववंशजांविषय एकाही ब्राह्मणानें कधींहि आक्षेप घेतला नाहीं. ही विचारसरणी ऐतिहासिक सत्यांत जाम जखडून बसविण्यासाठी राजवाडयांनी मंडळाच्या चतुर्थ संमेलनवृत्तांत दीपाचा उपद्व्याप केला, तर ठाण्याच्या विनायक लक्ष्मण भाव्यांनी मराठी दप्तराच्या रुमालांत मालोजीच्या खोपटीत अग्रिहोत्राचें पात्रच निर्माण केलें. शिवाजीच्या आजालाच अग्निहोत्री बनविला की शिवकालीन कायस्थांच्या शिवराज्याभिषेकाच्या वेदोक्ताच्या खटपटी आपोआपच स्वार्थी व पाचकळ ठरतील, हा सारा एवढ्या चित्पावनी काव्याचा रोख आहे. हा रोख मराठ्यांच्या पचनी एकदा सरळ जाऊन पडला की कायस्थांचे व मराठ्यांचे कायमचे बिनसलें! या पोरकट किंबहुना हलकट धोरणाचा मालमसालाच राजवाड्यांच्या प्रस्तुत विधानांत पडलेला आहे, हे सांगणे नकोच.
चां. का. प्रभूंच्या ग्रामण्यांचा इतिहास म्हणजे त्यांच्या राजकीय उत्कर्षाबद्दल ब्राह्मणांना पदोपदीं वाटणाऱ्या वैषम्याच्या आणि मत्सराच्या तडफडाटाचा इतिहास होय. ही एक व्याख्या नीट लक्षांत ठेविली की, ग्रामण्याविषयी किंवा वेदोक्तपुराणोक्ताबद्दल वेळोवेळी होणारा कि शिमगा म्हणजे काय असतो. हें तेंव्हाच उमगून येईल. बहुजनसमाजाच्या दातृत्वावरच जगणाऱ्या भिक्षुकशाही प्रत्येक वेळी निर्वाणीचा दर्भ म्हणून ब्राह्मणेतरांच्या धर्माचरणाविषयी आक्षेप घ्यावे. आणि मानसिक गुलामगिरीत पिचणाऱ्यांनी या नकली भूदेवांची मनधरणी करावी, असा मूर्खपणाचा प्रघात आजवर चालूच आहे. यालाच राजवाडे मंत्रवदुपनयनाचा आग्रह असे भिक्षुकी नांव देतात, आणि म्हणतात की, हा आग्रह बाळाजी आवाजीच्या पुढारपणाखाली प्रथम शिवाजीच्या कारकीर्दीच्या शेवटास झाला. विद्याशंकर भारतीच्या काळापासून तो पुण्यास चित्पावन नोकरशाहीचें तळपट उडेपर्यंत चां. का. प्रभूवर एकंदर दहा ग्रामण्यांचा हल्ला भटांकडून चढविण्यांत आला. मग शिवकालीन ग्रामण्याला राजवाडे पहिला नंबर कसा देतात? बरोबर. बाळाजी आवजीच्या चिटणिशीपूर्वी त्यांना ‘सर्व अंधार’ दिसत आहे; अर्थात् त्यांनींच आपल्या खंडांत पूर्वीच्या ग्रामण्याची दिलेली माहिती त्यांना आतां का दिसावी व दिसली तरी कां पहावी? बाळ प्रभूवर झालेल्या ग्रामण्याचा विस्तृत इतिहास आम्ही प्रसिद्ध केला आहे तो वाचकांनी मुद्दाम पुन्हा तपशीलवार याचावा, अशी विनंति आहे. त्यांत (१) बाळप्रभूचा व शिवाजीचा अत्यंत स्नेह. (२) त्या आत्मभावाचा तत्कालीन कित्येक मराठे सरदार व देशस्थ ब्राह्मण अधिकाऱ्यांवर होणारा राजकरणी वर्चस्वाचा साहजिक परिणाम आणि (३) शिवाजीच्या उत्कर्षाबद्दल ठिकठिकाणी रुजू लागलेल्या मत्सराची पाळेमुळे समूळ उपटून टाकण्यासाठी राज्याभिषेक करून घेण्याची बाळाजीने शिवाजीला सुचविलेली युक्ति, ही मुख्य कारणे आहेत.
पूर्वीच्या दोन आणि या पुढच्या सात ग्रामण्यांप्रमाणेच प्रस्तुतच्या वादांत वेदोक्ताची किंवा धर्माची मामुली लंगडी सबब जरी पुढे होती, तरी राजकीय वर्चस्वाचे वैषम्य त्यांत विशिष्ट होते. हा सिद्धांत सर्व निःपक्षपाती इतिहासकारानी मान्य केलेला आहे. मोहिते महाडीक निंबाळकर सावंत जाधव घोरपडे वगैरे बडेबडे मराठे सरदार पहिल्यापासूनच शिवाजीच्या राज्यभिषेकाच्या कल्पनेला विरुद्ध तर एकटा बाबाजी त्यांच्या विरोधाच्या विरुद्ध अशी ही चुरशीची सुरुवात (For although the high-spirited Deccan nobles gladly followed Shivaji in the fild, they were unwilling in private life to concede to him any precedence. And at state dinners they resented that a Bhosla should sit on a seat raised above those assigned to Mohites and Nimbalkars, Savants and Ghorpades. He spoke of the matter to his secretary, Balaji Abaji Chitnis, and the latter urged him to take the royal crown from the hands, not of a Moghul Emperor, but of a Benaras priest. The king consulted his mother Jijabai, the saintly Ramdas and his favourite goddess Bhavani and found them all favourable to his secretary`s suggestion. - Kincaid & Parasnis, Maratha History, Part I, page) ‘महाराजांचा राज्याभिषेक वेदोक्तच झाला पाहिजे, तो मी अवश्यमेव घडवून आणीन’ या बालाजीच्या प्रतिज्ञेने चिडलेले भटमंडळ उपरोक्त मराठे सरदाराच्या बगलेत घुसले आणि बालाजीवरच ग्रामण्याचा हल्ला चढवून अप्रत्यक्षपणे राज्यभिक्षेक कल्पनेची गर्भहत्या करण्याचा बूट अस्तित्वात आला. ‘टोपी- बदल’ हे सुताच्या जानव्याप्रमाणेच भटाचे दुसरे वर्म आहे. असा वारा तशी शिडे फडफडविण्यांत भिक्षुकशाही अनामिका म्हणून प्रसिद्धच आहे. कार्य साधण्यासाठी दक्षिणी ब्राम्हण वाटेल त्यांच्या पाया पडतील आणि अस्पृश्योद्धाराचा नाटकी डोल आणून महार भंग्याच्याहि गळ्यात गळा घालतील. निःकायस्थ पृथिवी होत असेल तर मराठ्यांना क्षत्रियच काय पण ब्राह्मणहि म्हणावयास ते चुकणार नाहीत, किंबहुना ब्राह्मणाची उत्पत्ति मराठ्यांपासून झाली, असे जाहीरनामे फडकविण्यासहि मागेपुढे पहाणार नाहीत. मात्र काम झाल्यावर भटांचा रामराम घेतांना, त्याच्या पचनी पडणारांची काय दाणादाण उडते. याचे अनुभव प्रत्यही ब्राह्मणेतरांच्या परिचयाचे आहेतच असो. म्हातारीने कोंबडे झाकण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण अखेर उजडावयाचे ते उजाडलेच शिवरायाला पट्टाभिषेक झाला. भूवरील ग्रामण्याचे धुके पार वितळून गेले आणि शिरजोर झालेल्या सर्व मराठे सरदारांनी व मगर ब्राह्मणांनी छत्रपतीच्या सिंहासनापुढे विनशर्त माना वांकविल्या.
चां. का. प्रभूंवरील भिक्षुकी आक्षेपांचा निवाडा रघुनाथ पंडीताच्या’ मिती शके १५९१ सौम्यनाम संवत्सरे मार्गशीर्ष शु० ११’ च्या आज्ञापत्राने सर्वत्र जाहीर झाला. त्यात "चांद्रसेनी दालम्यगोत्री प्रसिद्ध राहतील. ते क्षत्रियवर्ण कल आहेत...कलगुयी आहेत .द्वेषबुद्धीनी कर्म करण्या चालविण्यास बखेडा करितील ते देवाब्राह्मणाचे द्रोही व राजदंडास अधिकारी होतील. " (ग्रा० पृ. १९) असा स्पष्ट उल्लेख आहे. राजवाड्यांनीहि आपल्या ६ व्या खंडात (पृ. ५२३. ५४६, ५४८) या प्रकरणाचे काही कागद छापिले आहेत. पण ते आता नवीनच कादंबरी बरळू लागले आहेत. ते म्हणतात की प्रभूच्या वेदोक्ताचा तंटा शिवाजीने आपल्या संभाजी पुत्राकडे जजमेंटासाठी पाठविल्याचा या महापंडिताला उल्लेख सापडला आहे आणि संभाजीने कायस्थ क्षत्रिय नाहीत व मंत्रयदुपनयनार्ह नाहीत असा कडक भाषेत निकाल सांगितला. संभाजीच्या कमिशनरशिपचा
उल्लेख राजवाड्यांना कोणत्या गळाठ्यांत सांपडला याची त्यांनी कोठेच वाच्यता केलेली नाही. मंडळाच्या चतुर्थ संमेलनवृत्ताचा दीप अखिल महाराष्ट्रभर पाजळून आज सहा वर्षे झाली व मंडळांत या मुद्यावर श्रीयुत वासुदेव सीताराम बेंद्रे यानी दस्तऐवजी चर्चा केली; तरीहि या उल्लेखाबद्दल मंडळ किंवा राजवाडे यांनी अझून चकार शब्द काढलेला नाही. अर्थात् हा सर्व ‘दडपून देतो ऐसाजे’ चाच धाडसी प्रकार ठरतो.
संभाजीच्या कमिशनरशिपचे राजवाडी विधान पाहिले म्हणजे झांशीच्या राणीला पृथ्वीराज चव्हाणाची मावस बहीण ठरविणाऱ्या आंग्लेतिहासकारांस हंसण्याची आता सवडच नाही. संभाजीचा जन्म शक १५७९ (सन १६५७) साली झाला. (पहा मंडळाचे चतुर्थ संमेलनवृत्त, जेधे शकावली पृ. १८१) बाळप्रभूवरील ग्रामण्याचे निराकरण करणारे रघुनाथपंत हणमंते पंडितराव यांचे आज्ञापत्र मिति शके १५९१ सौम्यनाम संवत्सरे मार्गशीर्ष शु. ११ चे आहे. (सन १६६९) या दोन काळांतले अंतर पहा :-
ग्रामण्य निवृती.. सन १६६९
संभाजीचा जन्म..सन १६५७
ग्रामण्याच्या वेळी संभाजीचें वय १२ वर्षांचे होतें. ग्रामण्यासारख्या बिकट धार्मिक भानगडीच्या प्रश्नाचा निकाल लावण्यासाठी १२ वर्षांच्या शेंबड्या पोराला कमिशनर नेमणारा शिवाजी मराठी स्वराज्यसंस्थापक खास नसावा. तो कोणीतरी राजवाडयांच्या विश्वमित्री सृष्टीतील दुसराच एकदा अक्कलशून्य टोणपा असावा, हे उघडच दिसते. आधुनिक पुणेकर संशोधक आपल्या ऊर्ध्वमुखी मेंदूतून काय काय नवीन सृष्ट्या निर्माण करतात, हे नुसते पहाणें देखिल मोठे करमणुकीचे साधनच आहे. राजवाड्यांच्या या काल्पनिक कादंबरीतून आणखी काय काय हास्यास्पद विधाने निघतात ती पहा.
[१] ग्रामण्याचा प्रश्न धार्मिक, वैदिक धर्म म्हणजे छप्पन्न गुंतागुंतीचे कैवर्तकी जाळे. देशकालपरिस्थितीप्रमाणे अखिल मराठ्यांना व खुद्द शिवाजीच्या घराण्याला वेदोक्त पुराणोक्ताची दाद सुद्धा नव्हती. मालोजी, शहाजी, शिवाजी अगर संभाजी यांपैकी एकाचाहि व्रतबंध, किंवा उपनयनविधि झालेला नव्हता. तो प्रघातच त्यांना माहीत नव्हता. तो प्रघातच त्यांना माहीत नव्हता. बाळप्रभूनें (आंता माहित झाला आहे तरिही मराठ्यात सध्याही उपनयन विधी मुळीच रूढ नाही.) राज्याभिषेकाचा आग्रह धरिला तेव्हांच वेदोक्त-पुराणोक्ताचा वाद उपस्थित झाला आणि अनेक भानगडींना तोंड देऊन एकट्या शिवाजीचा मुंज त्याच्या वयाच्या ४५ व्या वर्षी राज्याभिषेकप्रसंगी लागली. असल्या शिवाजीला कायस्थांच्या धर्माधिकारांचा निर्णय लावण्यात बारा वर्षांच्या संभाजीला कमिशनर नेमण्यास राजवाडे लावतात, तेव्हा त्यांच्या सारासार बुद्धीचे दिवाळे वाजले असे कोणी म्हटल्यास त्यात वावगे ते काय?
[२] अर्धी अधिक हयात खलास झालेल्या विसाव्या शतकातील पदवीधर, समाजशास्त्री व्युत्पत्तीप्रदीप व इतिहास संशोधक राजवाड्यांना जर एवढेहि तारतम्य नाही, तर १७ व्या शतकांतला, अशिक्षित, केवळ १२ वर्षे वयाचा अल्लड कोवळा पोर, ज्याची मुंजहि झालेली नाही, वेद कशाशी खातात व पुराणे कशाशी पितात हेहि ज्याला माहीत नाही. असल्या संभाजीला राजवाडे कायस्थांच्या धर्माधिकार-निर्णयाचे कमिशनर नेमतात, तेव्हां हे इतिहास संशोधन की भांग्यामारुतीच्या अड्ड्यावरच्या गप्पा?
[३] ज्या शिवाजीच्या घराण्यांत वेदोत्ताबद्दल धूमाकूळ घालण्यात दक्षिणी भिक्षुकांना अजूनहि शरम वाटत नाही. कोल्हापूरच्या शाहू महाराजांना व अखिल मराठ्यांना तंजावर केसच्या जजाने शूद्र ठरविल्यामुळे महादेव राजाराम बोडसासारखे चित्पावन आनंदाने टिऱ्या फुटतात, त्याच भोसले घराण्यातला अप्रबुद्ध संभाजी म्हणे ‘कायस्थ प्रभू शूद्र आहेत’ असा कडक भाषेत निर्णय देतो, आणि संभाजीचा हा निर्णय तत्कालीन व वर्तमान भटाभिक्षुकांना शिरसावंद्य मान्य होतो हे तर महदाश्चर्यच मानले पाहिजे.
[४] धार्मिक बाबीबद्दल छत्रपतीचे किंवाभोसल्यांचे किंवा मराठ्यांचे निर्णय जर च्या वेळी सर्व भटांना मान्य होत होते तर ते आतांच का होत नाहीत? कोल्हापूरच्या विद्यमान क्षात्र वैदिक शाळेबद्दल नालिस्त्या करणाऱ्या भटांची गति कोणत्या नंबरच्या नरकात आहे, हे राजवाडे किंवा मंडळ सांगू शकेल काय? बरं ज्या संभाजीची` वेदोक्त` मुंजच झालेली नव्हती, व म्हणूनच ज्याला वेदाक्षर ऐकण्याचा किंवा उच्चारण्याचाही अधिकार नव्हता, त्याकडे वेदशास्त्रसंपन्न. भटमंडळ धार्मिक निर्णय मागण्यास गेले, ते कोणत्या वेदाच्या आधारावर?
[५] शिवाय, चां का प्रभू आणि खुद्द शिवाजी यांचा अनोन्य संबंध लक्षात घेता, राजवड्यांनी संभाजीच्या कमिशनरशिपचे जे पिल्लू आपल्या चित्पावनी कल्पनेतून उबवून काढले आहे ते किती खोडसाळ आहे याचा तेव्हांच निकाल लागतो.
ज्या शिवाजीने सर्व महाराष्ट्रीयांच्या आधी चां.का.प्रभू सरदारास आपलेसे करून, त्यांच्या हिमतीने व एकनिष्ठेने आपल्या सर्व महत्त्वकांक्षा रंगरूपास आणल्या, ज्या कायस्थ प्रभू सरदारांच्या रक्तावरच शिवाजीचे हिंदवी स्वराज्याचे टोलेजंग बुरूज उभे केले; जो शिवाजी बाळचिटणिसाविषयी
बाळाजी माझा प्राण आहे
असे वारंवार नुसते म्हणतच नसे, तर स्वदस्तुराच्या पत्रात (स्वस्तिश्री राज्याभिषेक १ आनंदनाम संवत्सरे, ज्येष्ठ वद्य प्रतिपदा भानुवासरे, क्षत्रिय कुलावंस श्री राजा शिवछत्रपति स्वामी यांणीं राजकर्य घुरंघर विश्वासनिधि राजमान्य राजश्री बाळाजी प्रभु चिटणीस यासी आज्ञा केली ऐसीजे तुम्ही स्वामीसेवा बहुत निष्ठेनें करून, श्रमसाहस फार केले. राज्यवृद्धीचे कामी आलां. यावरून तुम्हावर कृपाळू होऊन अष्ट प्रधानांतील पद द्यावे असे मनीं आणि असतां, तुम्ही विनंति केली कीं आपणाकडे चिटणीसीचा दरख चालत आहे, हा अक्षयी वतनी वंशपरंपरेनें सन्निध व सर्व राज्यांतील चालवावा व कारखानीसी आणि जमेनिसी दोन धंदे राज्यांतील आपल निसबतीस दिल्हे, ते अक्षयी असावे. याजवरून कृपा करून चिटणिसी सन्निधानची व सर्व राज्यांतील तुम्हांकडे दिल्ही असं. स्वामीचे वंशीचा कोणी अन्यथा करणार नाहीं. तरी लिहिल्याप्रमाणे सदरहू प्रयोजनाचे व्यापाराची सेवा तुम्ही व पुत्रपौत्रादि वंशपरंपरेनें करून सुखरूप अनुभवणें. आणिजे. छ. बहूत काय लिहिणे. शके १५९६ ज्येष्ठ वद्य) सुद्धा स्पष्ट नमूद करतो की तुम्ही स्वामीसेवा बहुत निष्ठेनी करून श्रम साहस फार केले, राज्यभिवृद्धीच्या कामी आला. “तोच शिवाजी बाळप्रभूच्या धर्माधिकार-निर्णयाचे किचकट काम संभाजीसारख्या बारा वर्षांच्या अल्लड मुलाकडे सोपवितो । ही कल्पना लढविणारा कादंबरीकारही मूर्ख ठरेल, मग इतिहास-संशोधक म्हणविणाराच्या तोंडात कोणी शेण घातल्यास त्यांत नवल नाहीं, धर्म संरक्षणाच्या सबबीखाली ब्राह्मणानी शिवाजीच्या विरुद्ध जी कुटील कारस्थाने लढविली, त्यांवर मंडळाभिमानी राजवाडे भावे प्रभृतीने पांघरून घालण्याचा केवढाहि आटोकाट यत्न केला, तरी शिवाजीनें भटांवर उगविलेल्या सुडाच्या आसुडाचे तडाखे आरोपींची पाठ आरपार फोडून इतिहासांत उमटले (कारखान्यांकडून ब्राह्मण कारकून दूर करून प्रभु कारखाने यांत ठेविले. त्यांजवर मोरोपंत बोलिले की कारखानीयऋजे हुद्दे मातबऱ्या लोकावर टाकले याने नाश होईल. तेव्हां राजियानें उत्तर दिलें कीं, ज्या जागेचा ब्रह्मणांवर इतबार टाकिला ती जागा अम्हास हस्तगत जाहली. राजपुरी प्रबूंवर हबशी यांचा इतबार ती जागा हस्तगत होत नाहीं. जे स्थळी प्रबूबर इतबार ते स्थळ एकाएकीं येत नाही. त्यांजवर इतबार असावा. मग निळोपंत व मोरोपंत मनांत खोंचल, उगेच राहिले.") आहेत. तारिख-इ-शिवाजी या बखरीतला उतारा पहा :
" गंगा (गागा) भट बनारसहून आला होता, त्याजकडून शिवाजीनें वेदमंत्र शिकून ब्राह्मणासारखे आचरण करण्यास सुरूवात केली. त्यावरून सर्व ब्राह्मणांनी गागाभट्टावर बहिष्कार घातला. त्यावर शिवाजीने असा हुकुम काढिला की `ब्राह्मण हे धर्मगुरू असून वंद्य आहेत. परंतु राज्यांत त्यांस नोकरीस ठेवणें हा धर्माचार नाहीं, सबब देवार्चनापलीकडे दुसऱ्या कोणत्याहि सरकारी कामांत त्यांस नेमण्यात येऊ नये, ह्या हुकुमानुसार ब्राह्मणांस नोकरीवरून काढून त्यांच्या जागा प्रभूस देण्यात आल्या. तेव्हां ब्राह्मणाबद्दल मोरोपंतानें पुष्कळ रदबदली केली. तो म्हणाला, `महाराज, आपण म्हणता हाच खरा मार्ग, परंतु आपल्या खास नोकरीत एकटया प्रभूंवर विश्वास ठेवणे वाजवी नाहीं. त्यामुळे राज्यास हानि धोका अगर संकट येईल.` शिवाजी बोलला, प्रभूंची जात सर्वथैव विश्वासपात्र आहे. सीदीसारख्या परक्यांनी सुद्धां राजपुरीच्या रक्षणास प्रभु ठेविले आहेत. ती नोकरी विश्वासाने बजावीत असून प्रसंगी आपले प्राण खर्ची घालण्यासहि ते कमी करीत नाहीत. तेव्हां मोरोपंत निरूत्तर झाला."
सरदेसाईकृत मराठी रियासत पृ. ४९४) यावरून स्पष्ट सिद्ध होईल की संभाजीच्या कमिशनरशिपबद्दलचें राजवाड्यांचे विधान निव्वळ काल्पनिक अतएव अत्यंत खोडसाळपणाचें व खोटं आहे. संभाजीच्या कमिशनरशिपबद्दल राजांनी जी एक पुणेरी गप्प तांसून भिरकावून दिली. तिच्या पुष्टीसाठी पुढे ते आणखी काय म्हणतात ते पहा:--
ह्या सामाजिक वादाचे राजकीय परिणाम मोठे विलक्षण व भयंकर झाले. चांद्रसेनीयांच्या वेदादिधारकाला संभाजी राजानें विरोध केला व तो सौम्य भाषेला सोडून केला. त्याचा परिणाम असा झाला की सर्व कायस्थ मंडळ संभाजीच्या विरुद्ध गेलें. शिवाजीच्या मृत्यूची बातमी वेळेवर संभाजीला कळली नाही. संभाजीच्या मनात येऊ नये, त्या मुत्सद्यांविषयीं संशय येत चालले. त्या संशयाला कायस्थ, ब्राह्मण, मराठे, स्त्रिया व पुरुष बळी पडले कलशाखेरीज संभाजीला विश्वासपात्र असा माणूस मिळण्याची पंचाईत पडली. शेवटी शत्रूच्या हस्ते संभाजी मृत्यु पावला. ह्या सर्व क्रांतीला सामाजिक विषमतेचा जाच असह्य होऊन संतप्त झालेले कायस्थ कारण झालेले आहेत, अशी तत्कालीन राजकारणाचें अंतरंग बारकाईने पाहून, माझी समजूत झालेली आहे."
****
भाग ३
संभाजीनें चांद्रसेनियांच्या वेदाधिकाराला विरोध केल्याची जी गप्प राजवाड्यांनी झोकून दिली आहे. ती सौम्य भाषेंत होती का नव्हती, यांच्याशी आम्हाला काही एक कर्तव्य नाहीं, संभाजीच्या कमिशनरशिप बद्दलचे विधानच सपशेल ढासळून पडल्यावर राजवाड्यांच्या याबद्दलच्या पुढील कादंबरीशी माथेफोड करीत बसण्यात अर्थ नाही, हे उघडच आहे. त्यातूनही. राजवाड्यानी बालसंभाजीच्या जजमेंटाबद्दलचा उल्लेख किंवा दस्तऐवजी पुरावा पुढे आणून आजपर्यंतच्या या ग्रामण्य प्रकरणाच्या उपलब्ध कागदपत्रावर डावर ओतण्याचे श्रेय मिळविलेले नाही. अर्थात या मुसक्या कल्पनेशी लढत बसणे केव्हाही वाजवी होणार नाही. बारा वर्षांच्या बालसंभाजीच्या कमिशनरशिपटलचा राजवाड्यांचा अस्सल व विश्वसनीय दस्तऐवज पुढे येऊन त्याने तत्कालीन श्रीशंकराचार्यांच्या आज्ञापत्राना आणि बखरींना एकदा पाजी ठरविले की त्याचा विचार पुढे पहाता येईल परंतु येथेही मोठी अडचण आहे कारण राजवाड्यांची जगद्गुरुच्या पीठाबद्दलची अनन्य भक्ति ते येणेप्रमाणे प्रसिद्ध करीत आहेत. ते पृ. ४८ वर म्हणतात, शंकराचार्यांदीची धर्मपीठे आहेत; त्यावर अजाण भटभिक्षुक क्षुद्रपणे विराजत आहेत. कायस्थांच्या मागण्यांचे स्वरूप काय त्यांचा इतिहास काय, त्यांना प्रतिरोध केला त्याची फळें काय, व त्या पुरवावयाच्या कशा या बाबीसंबंधानें आचार्यांच्या ठायीं व आचार्यांच्या सल्लागारांच्या ठायी पूर्ण अज्ञान आहे. " या उद्गारावरून जगदगुरूच्या पीठासनाचा
चित्पावनांना मिळालेला “पक्का काट”
राजवाड्यांच्या अंतःकरणाची कशी लाही लाही उडवीत आहे. हे कळून येईल ज्या सद्गृहस्थाला शंकराचार्यांच्या गादीवरील प्रत्येक प्राचीन अर्वाचीन धर्माधिकारी अजाण भट भिक्षुक क्षुद्रपणे विराजणारा दिसतो आणि ज्याचे सल्लागार सुद्धा अज्ञानी दिसतात, त्याच्या धर्मलंडपणाबद्दल हिंदुसमाजाने त्याची कीव करण्यापलीकडे अधिक काय करावे?
राजवाड्यांनी संभाजीच्या कारकीर्दीतच कायस्थ प्रभूंना राजद्रोही ठरविण्याचा केलेला उपक्रम हास्यास्पद असला तरी कानाडोळा करण्याइतका क्षुद्र नव्हे. या उपक्रमाचा हेतु फार खोल व अत्यंत दुष्टाव्याचा आहे. बऱ्याच शहाण्या कायस्थ प्रभूंना त्याची चित्पावनी नांगी दिसणार नाही व भासणारहि नाही. इतक्या सफाईत हा दंश करण्यात आलेला आहे. शिवाय, हा देश मंडळाच्या अहवालांतच वज्रलेप मुद्रित करून ठेवल्यामुळे तर त्याचे घोर परिणाम कायस्थ प्रभूच्या भावी वंशजाना एकलहरी सर्पदंशाप्रमाणे केव्हा ना केव्हां भोगणे प्राप्तच आहे. अखिल महाराष्ट्रीय हिंदु समाजात इमानाची व स्वामीनिष्ठेची प्रौढी मिरवणारी एकच चां. का. प्रभू जात आहे.(या सद्गुणांचा सध्या विकृत अर्थ घेऊन, इंग्रजी नोकरशाहीची कारकुंडेगिरी करणें हींच कायस्थाची लक्षणे होऊन बसली आहेत, हे दुर्दैवच म्हटले पाहिजे.) चित्पावनाच्या उत्पत्ति स्थितीचा इतिहास म्हणजे अथेति निमकहरामिचा, असा निदान सर्वत्र लौकीक आहे. पूर्वीची मराठेशाही सोडली तरी चालू आंग्लाईत सुद्धा
चित्पावन मंडळ इंग्रेजांच्या विरुद्ध
गेल्याचे दाखले दररोज दिसत आहेत. राजवाड्यांच्या मनोवृत्तीच्या चित्पावनांची अशी पोरकट समजूत झालेली दिसते की आपल्या जातीची ही नामुष्की नाहींशी करायला, इतर जातींविषयीं तसल्याच नामुष्कीचे काही तरी लेखी पुरावे दस्त करून ठेवले म्हणजे झाले, वेळ आली की बोट दाखवायला जागा तरी झाली!
दुष्कृत्यांचे परिमार्जन करण्याची ही तऱ्हा मननीय नाहीं असें कोण म्हणेल? यामुळे कायस्थांची बदनामी करण्याचे वीरकंकण हाती राजवाडे भावे प्रभृतीच्या इतिहास संशोधनाची गति वक्रनयनी झाली असल्याचे मासले अलीकडे पदोपदी आढळतात. भाव्यांचे मराठी दप्तर घ्या, मंडळाची संमेलन वृत्तें घ्या किंवा इतर टांचणे टिपणें घ्या, त्यात
माझ्यासारखी कधी होशील
ही वृत्ति उद्दाम झालेली आढळते. मग संभाजीच्या खुनाची व तत्कालीन राज्यक्रांतीची जबाबदारी राजवाड्यांनी कायस्थांवर न टाकावी तर काय करावें? ब्राह्मण उघडउघड ब्रह्ममुखोत्पन्न! सर्व जगत्रय म्हणजे त्याची जन्मप्राप्त जहागीर सर्व विश्वच त्यांचे. त्यांच्यावर खुनांचा व राज्यक्रांत्रीचा आरोप कोणी कसा सिद्ध करणार? बारा वर्षांच्या बालसंभाजीच्या जजमेंटनें चिडून संतप्त झालेल्या हरामखोर व खुनशी कायस्थ मंडळाच्या कारस्थानामुळे संभाजीचा खून व राज्यक्रांति झाली, अशी तत्कालीन राजकारणाचे अंतरंग बारकाईने पाहून ‘समजूत झालेल्या’ राजवाड्यांना, कोणी झाला तरी हाच सरळ प्रश्न विचारील की कायस्थ विरुद्ध गेले ही गोष्ट खरी मानली तरी संभाजीचा शब्द वेदवाक्य मानणारे भिक्षुकशाहीचे खंदे वीर महावीर व मुत्सद्दी ऐन राज्यक्रांतीच्या प्रसंगी कोठे मेले होतें? त्यांनी खुनशी कायस्थांच्या चळवळींना पायबंद का लावलां नाहीं? अवघ्या महाराष्ट्रांत जर शिवकाली चांद्रसेनीयांची संख्या ५००० हून जास्त नव्हती (राज. पू. ३९) आणि ब्रह्ममुखोत्पनांचा पसारा ढेकूण चिलट डांसाइतका विश्यव्यापी होता, तर त्यांना या अल्पसंख्य हरामखोरांचा संभाजीच्या जिवासाठी कांहीच बंदोबस्त करता येऊ नये? असेंहि धरलें की सगळे ब्राह्मण अद्वैत चिंतनांत गांजाधुंद होते, तर संभाजीचा राज्यक्रांती टाळण्यासाठी कोणकोणत्या ब्राह्मण वीरांनी आपल्या जिवाची मसणवटी केली, याचा पुरावा मंडळानें किंवा राजवाड्यांनी अवश्य द्यावयास पाहिजे होता. अनुनहि त्यांनी तो द्यावा, अशी आमची आग्रहाची विनंती आहे. मात्र, राजद्रोहाचे व स्वराज्यनाशाचें शाब्दिक खापर कायस्थांच्या टाळक्यांवर फोडून जर या संशोधक महात्म्यांचे पूर्वज गतीला जात असतील आणि यांना स्वतःला याच जन्मीं मोक्षपद सुलभ असेल, तर त्यांनी खुशाल आणसीहि विश्वमित्री सृष्ट्या निर्माण कराव्या. कोणीहि कायस्थ किंवा ब्राह्मणेतर त्याना आड येणार नाही. वाटेल तर त्यांनी स्वतःसाठी महाराष्ट्राचा इतिहास उलट्या पावलांनी लिहून काढावा; त्यालाहि आमची ना नाहीं.
मंडळांतल्या काही नवीन तरुण संशोधकांनी राजवड्यांना ‘गुरूवर्य गुरूवर्य’ किंवा `इतिहाससंशोधनेश्वर `म्हणून आकाशाइतके उंच धरले, आणि संभाजीकालीन राजकारणाचे अंतरंग मी अगी बारकाईनें संशोधन केले असल्याची त्यांनी केवढीहि घमेंड मारली असली, तरी आम्ही प्रतिज्ञापूर्वक सांगू शकतों की राजवाड्यांना संभाजीकालीन इतिहासाचा श्रीगणेशा सुद्धा असून उमगलेला नाही. अलीकडे प्रो. जदुनाथ सरकार वगैरे संशोधकांनी संकलित बोलेल्या साहित्यावरून असे स्पष्ट दिसतें की उपलब्ध
संभाजीचें चरित्र अत्यंत विपर्यस्त
आहे. तो जितका क्रूरकर्मा, व्यभिचारी, व्यसनी किंवा उतावळा म्हणून रंगविण्यात आलेला आहे. तसा वास्तविक प्रकार आता दिसत नाही. संभाजी विरूद्ध कारस्थानें लढविणान्या कंपूनें स्वतःवरील राज्यक्रान्तीचें पाप टाळण्यासाठी संभाजीविषयीं भलभलत्या कंड्या उलटविल्या व त्या बखरींत उमटविल्या, असे सिद्ध होण्यास आतां फारसा अवकाश नाहीं. आमचा मुख्य मुद्याचा प्रश्न एवढाच आहे कीं सर्व कायस्थ मंडळ (निदान कांहीं थोड्या कायस्थ व्यक्ति तरी) संभाजीच्या विरूद्ध गेल्या होत्या काय? शिवछत्रपतीच्या स्वराज्य स्थापनेत अकल्पनीय धडाडीने व अतुल स्वार्थत्यागाने पुढाकार घेणारे कायस्थ प्रभु शिवाजीचा मृत्यु होतो न होतो तोच निमकहराम बनून राज्यक्रांती करण्यास का उद्युक्त होतात? राज्यक्रांती किंवा संभाजीचा वध साधण्यात त्यांचा हेतु काय? बरे, दुसऱ्याच छत्रपतीच्या अमदानीत कायस्थ लोक क्रांतीकारक बनतात किंवा ठरतात, तर पुढील संबंध मराठेशाहित व पेशवाईतहि सर्व राजकारणाच्या नाजूक व महत्वाच्या जागांवर कायस्थ मुख्यत्यारीने राहिले ते त्यांच्या एकनिष्ठेवर, कर्तबगारीवर, स्वराज्याभिमनावर टिकले, का सारे छत्रपति व पेशवे हेच मूर्ख व टोणपे होते?
अझूनहि बऱ्याच देशी संस्थापनात कायस्थ दिवाण व कारभारी आहेत ते कायस्थांच्या राज्यक्रांतिकारक चित्पावनी वृत्तीच्या पुण्याईवरच टिकले आहेत काय? आजपर्यंतचा उपलब्ध इतिहास पाहिला तर असे स्पष्ट दिसून येते की
छत्रपतीच्या तक्ताशी चित्पावन मात्र बेइमान झाले. कायस्थ प्रभू अखेरपर्यंत राजनिष्ठच राहिले.
शिवकालीन स्वराज्यस्थापनेची आणमाक करणाऱ्या दादजी नरसप्रभू देशपांड्यापासून तो शेवटच्या प्रतापसिंहासाठी तब्बल १४ वर्षे विलायतेत झगडणाऱ्या रंगो बापूजीपर्यंत कोण कोण कायस्थ छत्रपतीच्या तक्ताशी बेईमान झाले, त्यांची यादी मंडळाने अवश्य प्रसिद्ध करावी, असा आमचा आग्रह आहे. घमेंडखोर मंडळ या विनंतीकडे दुकुनहि बघणार नाही हे आम्ही जाणून आहो. एखाद्याच्या घराला आग लावून स्वस्थ मौज पहात बसणे हे ब्राह्मणांचे शील सर्वश्रुतच आहे शिवाय इतरांना असभ्य ठरविण्यासाठी मौन सर्वार्थ साधनम् मुलाम्याने स्वतःला सभ्य मानण्याच्या कामी मंडळाचे कार्यकते मोठे इब्लिस आहेत.
मराठी स्वराज्याच्या कल्पनारंभापासून तो चित्पावन नोकरशाहीच्या अरेरावी वर्तनामुहे तें टार होईपर्यंत छत्रपतींच्या नावाचा तक्ताचा आणि स्वराज्याचा अभिमान धरून अनेक हाल अपेष्टांना आणि मत्सरी ग्रामण्यानाजर कोणी तोंड दिले असेल तर ते एकट्या चा का प्रभु समाजानेच मराठी राज्याचा पायांत मराठ्यांच्या जोडीने कायस्थ प्रभू वीराच्यांच आहुती पडल्या तीव्र विरोधांना किंवा ग्रामण्यासारख्या मत्सरी छळांना दाद न देतां छत्रपतीच्या राज्यभिषेकासारखा ऐतिहासिक प्रसंग कायस्थांनीच पार पाडला. शिवाजीमहाराजांपासून तो शेवटच्या छत्रपतीपर्यंतच्या प्रत्येक छत्रपतीच्या महत्त्वाच्या कामी कायस्थ प्रभू वीराचेंच रक्त खर्ची पडलेले आहे. मराठयांच्या सत्तेचा उत्कर्ष पृ० ३६-३७ वर न्या. रानडे म्हणतात की ज्या जातींवर देशाची सारी भिस्त अशा प्रमुख प्रमुख जातीमधून शिवाजीने आपले प्रधानमंडळ निवडून काढलें होतें. " चित्पावनांची जात त्या वेळी अंधारातच असल्यामुळे, न्यायमूर्तीनी या मजकुरापुढें तत्कालीन मावळे, मराठे, देशस्थ ब्राह्मण आणि चा. का. प्रभू या शर्तीतील जी प्रमुख प्रमुख वीरांची नावनिशी दिली आहे, त्या यादीत सहाजीकच चित्पावनांचा वाससुद्धा कोठे येत नाही या यादीनंतर न्यायमुर्तीनी शेरा दिला आहे की "यांपैकी एकानेही शिवाजीशी निमकहरामपणा केला नाही. निमकहरापणाचे बीज (हे लोक (चित्पावन, मनाचे सरळ नसतात; आणि अल्पस्वल्प स्वार्थासाठी राज्याची राज्ये धुळीस मिळविण्याला मागे पुढे न पाहणारे लोक या जातीमध्ये आजपर्यंत पुष्कळ उत्पन्न झाले आणि त्यांनी आपले पराक्रमहि त्या रीतीनें दाखविले. xxx स्वजातीज्या हितासाठी अन्य जातींशीं द्वेष करून त्यांचे जे वास्तविक हक्क किंवा अधिकार त्यांकडे दुर्लक्ष करणे, किंवा दाबून टाकणें हें मात्र वाईट. यद्यपि चित्पावन ब्रह्मणांमध्ये अशा प्रकारचे कित्येक लोक झाले. खरे, आणि अझूनहि असल्या कोत्या मनाचे कित्येक त्यांच्यामध्यें आहेत, हेहि खरें, xxx यांच्या आंगीं आर्जव शक्ति हे मोठे कसब आहे आणि तेणे करून ते कसलेहि मोठे काम सहज तडीस नेतात."
कै. रौ. भि. गुंजीकरकृत सरस्वतिमंडळ.
(२) " ते (चित्पावन) स्वावलंबी, मेहनती, कोठेही पुढे घुसणारे, दीर्घ सूचना मनांत आणणारे, पण काही अंशी आपल्यापुरतें पाहणारे, बुद्धिमान् पण संकुचित दिलाचे लोक आहेत." - रा.नरसोपंत केळकर, केसरि ३-१०-१९२०) कोकणातून आले आहे आणि ते पेशव्यांच्या अमदानीत चित्पावनांनी आपल्या भाग्योदयार्थ जेव्हा कोकणातून घाटमाथ्यावर प्रयाण केले. त्या वेळीच ते त्यांनी बरोबर आणले. हे ऐतिहासिक सिद्ध तत्व कोणी कितीही मल्लीनाथ्या आणि व्युत्पत्त्या लढविल्या तरी खोडले जाणे शक्य नाही.
शिवाजीच्या कारकीर्दीपासून किंवा विधानार्थ त्याच्या शेवटच्या भागापासून तोसंभाजीच्या अंतापर्यंत या कायस्थ प्रभूपैकी मुख्य पुढारी बाळाजी व त्याचा मुलगा खंडो बल्लाळ हे दोघेच जरी गणतीत घेतले, तरी त्यांनी छत्रपतीच्या तक्ताशी किंवा खुद छत्रपतीशी काय विरोध किंवा कोणता निमकहरामपणा केला, हे पाहिले पाहिजे,
शिवाजी हयात असतानाच घरगुति कलहला व सापत्न मातेच्या मत्सराला कंटाळून संभाजी घराबाहेर पडला व मोगलाईत दिलेलखानास मिळाला. यात स्वराज्यद्रोह झाला, असे उथळ विचार करणारे वाटेल तर म्हणोत खरी वस्तुस्थिति अशी की तारुण्याने फुरफुरलेल्या या गर्द मराठ्याला शिवसिंहाच्या या सवाई पराक्रमी छाव्याला राजवाड्यातल्या निष्क्रीय आयुष्यापेक्षा मोगलाईतच का होईना कर्तबगारीला काहीतरी काय पाहिजे होता. पुढे लवकरच तो परत येऊन पन्हाळ्यास शिवाजीस भेटला. सर्व गोष्टींचा खुलासा केला आणि " आपणांस साहेबांचे पायाची जोड आहे. आपण दुधभात खाऊन साहेबांचे पायाचे चिंतन करून राहीन.
(सभासद पृ. ९४) अशी प्रतिज्ञा करून तेथेच राहिला. शिवाजीच्या शेवटच्या दुखण्यांतच सोयराबाईच्या राजाराम राज्याभिषेकाचे कारस्थान सुरू झाले व त्याला बहुतेक सर्व ब्राह्मण मंत्रीमंडळ सामील झाले. शिवाजीचा मृत्यु (३ एप्रिल १६८०) होतांच या कारस्थानाला जोर आला. संभाजीला पन्हाळ्यासच एकाकी कैद करून राजाराम राज्याभिषेक उरकण्याच्या या कारस्थानाला फक्त एकट्या बाळाजी आवजीचा कट्टा विरोध शिवराई नाण्याप्रमाणे चिटणीशी लेखणीच्या मखलाशीचा दरख तनाम रियासतीत राजमान्य व लोकमान्य असल्यामुळे चिटणीसानेच पन्हाळ्याच्या बंदोबस्ताची पत्रे लिहिल्याशिवाय मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो सचिवादि मंत्र्याच्या नुसत्या अकलेची मखलाशी फुकट होती. बाळाजीची मंत्र्यांनी पुष्कळच मनधरणी केली. त्यानें स्पष्ट जबाब दिला आम्ही दरखदार राजांचे, खावंद वडील संभाजी महाराज असता अशी पत्रे आम्ही लिहिणार नाही. तेव्हा तुम्हांस हा आग्रह करण्याचे कारण नाही.
(चिटणीस, पृ. २) परंतु मंत्र्यांचा आग्रह अगदी निकरावर आला. त्यांतच सोयराबाईच्या कडक आज्ञेची भर पडली. "तुमचे हातचे पत्र नसल्यास लोकांस पत्राचा विश्वास पडणार नाही. यास्तव तुम्हाकडे दरख, त्या अर्थ बरी वाईट पत्रे तुम्ही लिहावी, हे तुम्हांस प्राप्त लिहून यावी. सत्तेपुढे शहाणपण व समर्थापुढे अहंता चालविणे बरे नव्हे, म्हणून नाइलाजाने मी लिहित नाही. मूल आवजी बाबा आहे. त्यास स्वाधीन करितो. पाहिजे तसे करवा असे साहून बाळाजी वैतागाने स्वस्थ बसला. बाळाजीचा मुलगा आवजी याचे अक्षर थेट बापाच्या मखलाशीचे असे त्याचा फायदा मंत्र्यांनी घेऊन आजीकडून वाटेल तशी पत्रे लिहून घेतली. संभाजीने ही पत्रे पकडली तेव्हा संभाजीपुढे जबाब देतांना
“बाळाजी आवजी यांनी उत्तर दिल्हे की, राजाराम सहिष्णु आणि माहाराजांचे मनापासोन यास अधिकारी करावे व सर्वाची अंतःकरणे त्याचे ठायी वागतात खरी, परंतु ईश्वराची मर्जी असती " तरी राजाराम साहेबांस ज्येष्ठत्व का दिले नाही? तस्मात् संभाजी महाराजांचा पुण्योत्कर्ष, उग्रसेवेचे माहात्म्य त्यात सोयराबाई साहेबांनी विषप्रलय करून महाराजांस मारिलें तें सविस्तर राजश्रीस "कळले तेव्हा त्याचा माथा आप्रमाद नाही”
चिटणीसकृत बखर
असा स्पष्ट खुलासा होताच "चौक्या उठविल्या. बाळाजी आवजी प्रभु चिटणवीस यांनी आपले काम करावे असे सांगून (संभाजी महाराजाने) कृपा केली.’’ (कित्ता पृ. ६) इतकेंच नव्हे तर सर्वत्र शांतता झाल्यावर रायगडावर जो पहिला दरबार भरला त्यावेळी बाळप्रभूला उद्देशून संभाजीने काढलेले उद्गार पहा:
....कचेरी करून सर्वांस बोलावून चुकली गोष्ट आहे ती तुम्हास माफ केली. मनुष्यापासोन विरुद्ध गोष्ट घडते ती पडली. तुम्ही या गोष्टीची काळजी शपथपूर्वक करूं नका तुम्ही सांगाल तशी मी वर्तणूक करीन. महाराजांचे हाताखाली वागला त्या अर्थी तुम्ही `आम्हांस त्यांचे ठिकाणी आम्हां राज तुमचें बुडवा वा तारा` सर्वांस `जीव भरंसा वाटून आपापले कामावर सर्व हमवार जाले.’’
चिटणीसकृत बखर
तत्कालीन कायस्थांचा मुख्य पुढारी बाळप्रभू चिटणीस हा वरील पुराव्यावरून तरी, संभाजीच्या विरुद्ध गेला, असे मुळीच सिद्ध होत नाहीं. विरुद्ध गेलेल्या मंडळींची त्या खवळलेल्या नरव्याघ्रानें ठेवलेली बरदास्त बखरीत येणेप्रमाणे आढळून येते. किल्ल्यावरील लोक कित्येक फितले होते. दिंडी लाविली नाही. महाराज दिंडीनेच किल्ल्यावर गेले. कंक व सरनोबत भेटले आणि कान्होजी भांडवलकर हवलदार सदरेस होते त्यांस आधी कैद केले. आणि मोरोपंत प्रधान व अंणाजी सचिव यांचे घरी चौक्या पाठऊन कैद केले..... मोरोपंत प्रधान व सचिव यांची घर लुटून बेड्या घातल्या. "मोरोपंत सचिवादि प्राणी कायस्थ प्रभु असल्याचा पुरावा आम्हाला माहीत नाही. मग ही बक्षिसी राजनिष्ठेबद्दल मिळाली की काय? राज्याभिषेकाच्या वेळी मात्र त्रिबंक बाजी देशपांडे खासनीस याणी व आणखी ममतेंतील यांणी महाराजांस विनंती करून बोलले कीं साहेब सिंहासनाधीश होणार आणि प्रधान यांचे घरी चौक्या हें विहित नाही. `याजवरून चौक्या उठविल्या. (चिट. ६) सारांश, संभाजीच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच त्याच्याविरुद्ध जे कारस्थान झालें तें राजकीय होतें, धार्मिक नव्हतें, त्यति मुख्य पुढाकार मोरोपंतादि ब्राह्मणांनी घेतला होता. बाळप्रभूचा व कायस्थांचा त्यांत मुळीच संबंध नव्हता, है सिद्ध करण्यासाठी आणखी पुरावे मंडळाला पाहिजे असतील तर त्यांनी संशोधनवृत्ती सोडून प्रथम इतिहासवाचन करावें, अशी सूचना आहे.
यापुढे असा प्रश्न साहजिक येतो की जर बाळप्रभूविषयीं आलेल्या संशयाची संभाजीची निवृत्ति झाली होती, तर त्याने बाळप्रभूला पुढे हत्तीच्या पायीं का दिले? या कटाची थोडी परिस्फुटता केली पाहिजे. त्यासाठी कांहीं महत्त्वाच्या हकीकतींच्या तारखांची जंत्री खाली देत आहे :
सन १६८०
१९ मे ते १६ जून - आण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे, प्रल्हाद निराजी यांनी सेनापति
हंबीरराव लष्कर संभाजीला मोहिते कैद करून संभाजीपुढे पन्हाळ्यास आणतो. सर्व छत्रपति मानतें.
१२ जून :- संभाजी पन्हाळ्याहून निघतो. कैद करतो.
१८ जून :- संभाजी रायगडला येऊन राज्यकारभार हाती घेतो. व राजारामाला
२० जुलई :- संभाजीचा राज्यभिषेक,
१२ ऑक्टोबर :- मोरोपंत पिंगळ्याचा रायगडास मृत्यु
२० नवंबर:- बाळप्रभूचा मुलगा आवजी बल्लाळ संभाजी छत्रपतीचा खलिता घेऊन वकील नात्याने मुंबईला टोपकर कंपनीकडे जातो.
सन १६८१
ऑगष्ट :- संभाजीला विषप्रयोग करण्याचे कारस्थान उघडकीस येतें.
४ ऑगष्ट :- आण्णाजी दत्तोवर नाराजी होऊन तो ठार मारला जातो.
२ सप्टेंबर :- बाळाजी आवजी चिटणीस, महादाजी अनंत, सोमाजी दत्तो व हिरोजी फरजंद यांना ठार मारण्यांत येते.
या जंत्रीवरून वाचकांना स्वतंत्रपणे पुष्कळ अनुमाने काढता येतील. संभाजी रायगडास आल्यानंतर तब्बल एक वर्ष दोन महिने बाळप्रभू आपल्या चिटणिशीवर मुखत्यारी होता. राज्याभिषेक झाल्यानंतर बरोबर चार महिन्यांनी आवजी पंडिताला (बाळाजीच्या मुलाला) ‘अॅम्बासडर’ दरबारी वकील नात्यानें बनिया कंपनीकडे मुंबईस पाठवितो. अर्थात चिटणिसाच्या घराण्याबद्दल किंवा सर्व कायस्थांबद्दल संभाजीचा विश्वास अभंग होता, हें सिद्ध होतें. सन १६८१ च्या ऑगष्टमध्यें अवचित विषप्रयोगाचे कारस्थान उघडकीस येतें आणि तडाक्यासरसा आण्णाजी दत्तो सचीव ४ ऑगष्टला ठार मारला जातो. नंतर एक महिन्यानें बाळाजी व इतर मंडळी ठार मारली जातात. बाळाजीला ठार मारविण्याची जी ब्राह्मणी कारवाई झाली ती याच महिन्यांत.
ब्राह्मणी कारवाईचा नेहमी एक विशेष असतो. तो म्हणजे `परभारे पावणे तेरा हा होय सातारा राज्याचे व प्रतापसिंह छत्रपतीचे बारा वाजविण्यांत सुद्धा कुप्रसिद्ध चित्पावन आयागो बाळाजीपंत नातू याने हेंच धोरण स्वीकारले होते. आजहि नेहमीच्या व्यवहारांत ब्राह्मणी कारस्थानाचे धोरण पाहुण्याच्या टाळक्याने विंचू ठेचण्याचेच असते. ब्राह्मण कधी उघड माथ्याने समोरासमोर येऊन भिडत नाही. ते त्याचे ब्रीद नव्हे, ती त्याची अक्कल नव्हे, ते त्याचे तोड न तो त्याच्या रक्ताचा गुणच नव्हे! संभाजीचा कलुषा झाला तरी मिक्षूकच दक्षिणी आण्णाजी दत्तो झाला काय किंवा उत्तरी कलुषा झाला काय, सर्व ब्राह्मण एकजात एकजात एकधोरणी. कलुषा हा कवि होता. त्याची रंगेल बायको (कवि कलुषा कबजी म्हणोन कणौजी ब्राह्मण बहुत विद्वान्, मंत्रशास्त्र विद्या अंगम त्यास बहुत गम्य असे होते. त्यांची स्त्रीहि चतुर होती. त्यांनी महाराज वश करावे म्हणून वशीकरण मंत्रप्रयोग करून महाराजांची बहुत जवळीक व कृपा संपादून आगोदर राज्याभिषेकापूर्वी होतेच. चिट. पृ. ७.)
त्यानें स्वामीचरणी अर्पण केली होती : अर्थात् तो गोठा स्वार्थत्यागी ब्राह्मण म्हटला पाहिजे. हा महान् कपटी व धूर्त भिक्षुक अवरंगझेबाचा कारस्थानी` सीएडी ` म्हणून दक्षिणेत येऊन मराठी स्वराज्याच्या काळजाशी चिकटून बसला होता. त्याच्या शाबरी मंत्राच्या प्रभावाखाली संभाजी पूर्ण दडपला गेला असतांना त्याच्या गुप्त पत्रामुळे दिल्लीहून नूरमहंमदखान दक्षिणेवर गनिमी काव्याची चाल करून आला. त्यावेळी बाळाजीने संभाजीला खऱ्याखुऱ्या परिस्थितीची निर्भीडपणे ओळख देऊन, त्यास ताळ्यावर आणण्याचे धाडस केले. संभाजीच्या नजरेत कलुषांची कारस्थाने आली व त्याने बाळाजीनें, लिहून आणलेल्या पत्रावर स्वदस्तुरचे शिक्का मोर्बत केलें. ही पत्रे शंकराजी नारायण सचीव व श्रीनिवासराव प्रतिनिधी यास पोहचताच त्यांनी नूरमहंमदच्या सैन्याचा पार धुव्वा उडविला. स्वराज्यनिष्ठेला स्मरून बाळाजी आवजीने संभाजीला जर याच प्रसंगी जागे केलें नसते, तर कलुषाच्या या पहिल्या कारस्थानालाच संभाजी बळी पडला असता है अधिक विषद करून सांगायला नकोच. अर्थात् राजवाड्यांच्या कल्पित कादंबरीप्रमाणे संभाजी कमिशनरच्या जजनेटाने चिडून जाऊन सर्व कायस्थ मंडळ त्याच्याविरुद्ध गेले असे जर मानले, तर बाळप्रभूच्या या उत्कट कामगिरीची वासलाद ते कशी काय लावणार?
राजवाड्यांच्या मत्सरी संशोधक बुद्धीला या कामगिरीचे महत्व फारसे वाटणें शक्य नाही हे खरे, परंतु या कामगिरीच्या उलट्या पेंचामुळे कलुषाच्या कारस्थानाला जो जबरदस्त धक्का बसला, त्यामुळे तो तरी बाळप्रभूच्या चिटणीशीला यापुढे वचकू लागला. इतकेंच नव्हे तर मराठी राज्य बुडविण्यापूर्वी त्या राज्याच्या चिरस्थाइत्वाला सदैव चैतन्य देणारा आत्मा जो बाळाजी आवजी त्याचा काटा प्रथम दूर करण्याकरितां त्याला उपाय शोधावे लागले. हे उपाय शोधीत असतांनाच त्याला एक चित्पावनी वृत्तीचें कायस्थ पात्र हाताशीच सांपडले आणि ब्राह्मणांच्या लोकविश्रुत पॉलीसीप्रमाणे.
कायस्थाच्या नरड्यावर कायस्थ
बसवून कलुषाने आपला डाव बोलबोलता सिद्ध केला. स्वार्थासाठी आपल्या जातभाईची आतडी खाणारा कायस्थाधम म्हणजे दादजी रघुनाथ देशपांडे महाडकर हा होय. (या हरामखोराने शिवाजीच्या वेळी बेलवाडीच्या येसप्रभूचा गळा कापला व सावित्रीबाई ठाणेदारणीलाहि अधर्मयुद्धानें पकडली. बाळप्रभू चिटणिसालाहि अखेर हाच भोंवला. असला नराधम शंख प्रभूरत्नमालेत गोवणाऱ्या कायस्थ मालाकाराची तारीफ करावी तेवढी थोडीच.)याचा व बाळप्रभूचाद्वेष होता कबजी आल्यापासून ही स्वारी त्याच्या पुठ्ठ्यात, कृपत, अगदी थेट अंतरंगात लेली असे. पहिल्या चिटणिशी व कारखानिशी दरखादर डोळा होता. हा कबजीच्या पुट्ट्यांतला असल्यामुळे संभाजी छत्रपतीशी याला केव्हांहि मज्जाव नसे. सन १६८१ च्या ऑगष्टात विषप्रयोगाचे फिसाट उपटतांच या चित्पावनी कायस्थानें, कलुषाच्या चिथावणीवरून, संभाजीच्या कानाला, बाळप्रभूविरुद्ध दंश केला. आधींच संभाजी भरंसाट पिसाळलेला, त्यांतच दादजीनें आगीत तेल ओतले.
"चिटणिशी व कारखानिशी आपण करावी हे इच्छा (धरून) महाराजांस सुचविलें जे बाळाजी आवजी चिटणीस याणी पत्रें फितव्याची एकंदर राज्यांत व पन्हाळ्यास लिहिली असता, त्याजवर कृपा करूं नये. येखत्यारीत ठेवणे चांगले नाही. त्यांचे भाऊ शामजी आवजी कारखाननीस व सचिव यानी राजकारण हे बळाविले (चिट. पृ. ९) झाले. विषाचा एक थेंब पुरे संभाजी महाराज म्हणजे काय? स्वरा फितुरांनी कलुषाय मिथुकी डावपेचांनी पुरेहॅमलेट बनलेले त्यांनी `होय, फितव्यांत होते. पण बाळाजींनी आग्रह धरून पत्रे लिहिली नाहीत." असे म्हटलें. त्यावर सरकार, ही शुद्ध लुच्चेगिरी आहे. आपण नामानिराळे राहून पुत्राला पुढे केला. दुसरें काय? " अशी दादजीची मखलाशी होतांच ताबडतोब सर्वच जबाबदार चिटणिसांना हत्तीच्या पायाखाली ठार मारण्याचा हुकूम तोंडी हुकूम मिळण्याचाच काय तो अवकाश, कलुषा तो अंमलात आणून पार मोकळा! अशा रीतीनें कलुषानें आपल्या वाटेंतला कांटा दूर केला. पण दादजी रघुनाथ देशपांड्यांना चिटणिशी व कारखाननिशी? वाचकहो, जरा थांबा. बाळप्रभूची चिटणिशी म्हणजे पेशव्याची पेशवाई नव्हे ती असल्या उलट्या काळजाच्या कारस्थानाने मिळेल व मिळाली तरी पचेल! बाळाजी, त्याचा पुत्र आवजी व बंधु शामजी या तिघांचा खून झाल्याचे वर्तमान येसूबाईला कळताच तिने संभाजीची झणझणीत कान उघडणी केली. ती म्हणाली
`बाळाजी प्रभु मारिले हे उचित न केलें बहुता दिवसांचे आणि इतवारी व पोक्त. थोरले महाराज कृपाळू सर्व अंतरंग त्याजपाशी होत. चिटणीस राज्याचे व आपले प्राण ऐसे म्हणत आले. वंशपरंपरेनें चिटणिशी देऊन पत्र शपथपूर्वक त्यांस दिलें तें माहित असोन, त्यांणी अपराधहि कांही केला नाहीं. (असे असतां) लहानांचे (क्षुद्रांचे) सांगण्यावर हे गोष्ट कशी केली? सर्व कारकून गेले, मारिले, बेदिल झाले. अन्यायीही झाले, एक एक होते तेहि ऐसे केलें पुढे राज्य कसें चालेल? " यावर संभाजी महाराज म्हणतात, "आमचेही मनांत ही गोष्ट नव्हती. परंतु रागाचे समयी बोललो तितक्यावर परवानगी सांगून झालें ते वाईट वाटून उठून आलो. वाईट गोष्ट झाली खरी. तुम्ही त्यांचे धाकटे पुत्र दोघे आहेत ते खासगीकडे (ठेवून) त्यांचा बंदोबस्त दरमहा देऊन चालवावा त्यांचे कारकून लिहिणार त्यांचे हातेच काम चालविण्याचें. मुले लहान आहेत त्यांजवर कृपा करावयाची "बाळप्रभूच्या सर्व चरित्राचा अंत हा असा झालेला आहे. यति `वेदोक्त` कोठे आलें, `संतप्त कायस्थ` कोठे घुसले, `विषमतेचा जाच असह्य झालेले चांद्रसेनीय कोठे रुसले, ते फक्त मंडळाला व दीर्घबुद्धी राजवाडयांनाच माहीत. बाळाजी आयजीचे समग्र चरित्र वाचणाऱ्या कोणत्याहि स्वकीय परकीयाला ज्याच्या अराजनिष्ठेचा कधीं पुसटसुद्धा संशय आला नाहीं, त्याच प्रमुदीराच्या मार्थी राजवाडे एखाद्या बेफाम दरोडखोराप्रमाणे प्रभुद्रोहाचे खापर फोडतात व मंडळ या हलकट कृत्याला आपल्या चतुर्थ संमेलनवृत्तांत प्रसिद्धी देतें, या कृत्याला नाव तरी काय द्यावें?
आता संभाजीच्या सर्व कारकीर्दीत अनेकांपैकी जो कायस्थ प्रभू प्रामुख्याने आढळतो तो वरील बाळाजी आवजीचा मुलगा खंडो बल्लाळ हा होय, याचेरि समय चरित्र आजला उपलब्ध नाही असे मुळीच नाही. पण ते पहाण्याची राजवाडे तसदी घेतात कशाला? तथापि या प्रभूवराज्या राजनिष्ठेबद्दल इतर बखरकारांच्या पुराव्याचा उल्लेख करण्यापूर्वी न्यायमुर्ती रानावांचा अभिप्रायच प्रथम घेऊ म. स. उत्कर्ष पू. ११० १११ वर ते म्हणतात -
”प्रभूजातीच्या सरदारांपैकी दोघांची नावे सांगण्याजोगी आहेत. पहिला खड बल्लाळ चिटणीस- शिवाजीचा मुख्य चिटणीस बाळाजी आवजी याचा मुलगा त्याच्या बापास व चलुत्यास संभाजीने जरी निर्दयपणाने ठार मारिले होते. तरीपण खंडोने एकनिष्ठपणानें चाकरी करून पोर्तुगीज (फिरंगी) लोकांबरोबर झालेल्या लढाईत त्याने तरवार गाजविली. सबब संभाजीची त्यावर मर्जी असे”
राजवाडे हा उतारा नीट लक्षपूर्वक वाचतील, तर चिकित्सक न्यायमूर्तीनी अनेक ऐतिहासिक कागदांचे तीक्ष्ण अशा न्याय बुद्धीने परिशीलन करून काय निष्कर्ष काढला, है त्यांना नीट पटेल कायस्थांच्या वेदोक्त अधिकाराविरूद्ध संभाजी गेल्यामुळे कायस्थ त्याच्याविरूद्ध गेले. त्यामुळे सर्व तंत्र बिघडून संभाजी पकडला व मारला गेला. असे म्हणून त्यावेळच्या क्रांतीची जबाबदारी राजवाडे कायस्थाच्या माथी मारतात वरील साधार विवेचनावरून हे स्पष्टच होत आहे की शिवाजीच्या घराण्याची निरपेक्ष सेवा करण्याच्या कामांत अग्रगण्य आणि ज्यांच्या स्वामीभक्तीच्या बळावरच मराठेशाहीची स्थापना झाली त्या चांद्रसेनीयांवर कोणत्याही इतिहासकाराने आजपर्यंत राजद्रोहाचा असला पाणेरडा आरोप ठेवलेला नाही. संभाजीला दुर्व्यसनपराङ्मुख करण्याचा प्रयत्न चां. का. प्रभूंनीच केला अनेक प्रसग सभाजीचा जीव चां. का. प्रभूंनीच वाचविला. अर्थात् संभाजींच्या वेळी राज्यक्रांती होऊन समाजीचा जो हृदयविदारक अंत झाला त्याला कारण कायस्थ प्रभूंचा राजद्रोह नसून भिक्षुक मंत्र्यांच्या कारस्थानांनी उत्पन्न झालेली बेबंदशाही होय. असे सिद्ध करून दाखविण्यास फारसे प्रयास पडणार नाहींत. इतिहास पाहिला तर असे स्पष्ट दिसून येईल की राजद्रोहाचे कडू चित्पावनांना आरंभापासूनच पाजलेले आहे : हे त्यांचा प्रवेश राजकारणपटांगणात झाल्यापासूनच दिसून येतें! बाळाजी विश्वनाथापासून शेवटच्या बाजीरावापर्यंतच्या कोणत्या पेशव्याने स्वामीद्रोह केला नाहीं तें दाखवून द्यावे, असे आमचे चित्पावनांना आव्हान आहे. अलीकडे इंग्रजीशाहीत राजद्रोहाचा धडा इतरांस चित्पावनच घालून देत आहेत हे प्रस्तुतच्या राज्यकर्त्यांनी सर्वांस वेळोवेळी सिद्ध करून दाखविलें आहेच. मराठेशाहीतील ब्राह्मणांनी राजद्रोह केल्याची प्रत्यंतरे पहावयाची असल्यास कै. भागवत यांचे मराठ्याचे चार उद्गार हे पुस्तक पहावें.
मराठी इतिहासातील अत्यंत बारीकसारीक मुद्यांची चिकित्सा करताना न्या. रानड्यांना ज्या प्रभुच्या अराजनिष्ठतेचा किंचितसुद्धा कोठे भास झाला नाही. त्याचा राजवाडयांना संभाजीच्या सर्व परित्रांत येथून तेथून सारखा वास यावा, हे त्यांच्या बिघडलेल्या घ्राणेंद्रियाचे स्पष्ट चिन्ह नव्हे काय? सर्व कायस्थ मंडळ संभाजीच्या विरुद्ध कसे गेलें याचा उलगडा फक्त राजवाडेच करू जाणोत. इतिहास या बाबतीत अगदी निधड्या छातीने त्यांच्या विधानांच्या या चिंधडया उडवीत आहे. खंडो बल्लाळाने संभाजी महाराजांना अनेक संकटातून ((१) पुढे स्वारी गोव्याचे राजकारण झाले ह्मणून तिकडे गेली. बरोबर खंडोबा गेले. बरोबर एक कलमदान व कागदचे भेंडोळे घेऊन नेहमी स्वारीबरोबर धावावे. एके दिवशी संभाजीचा घोडा खाडीत पोहणीस लागला. जेरबंद होता यामुळे घोडा घाबरा झाला. तेव्हा खंडोबानी पाण्यात शिरून जेरबंद कापिला. इतक्यात एक शिपाई गलीमाचा पोहून सरकारवर चालून आला. त्याचे डोकीत कलमदान घातले आणि घोडा कडेस आणिला. हे पाहून खंडोबास पोटाशी धरून. तू खरा इमानी आहेस असे बोलिलें आणि अंगावरील पोषाख काढून दिला. आणि हींच वस्त्रे असें बोलिले. (सन १६८३). - कायस्थ प्रभूंच्या इतिहासाची साधनें पृ ९-१०.
(२) याच प्रसंगाबद्दल आणखी दुसरा दस्तऐवज म्हणतो की खासा राजश्रीनींही शिपायगिरी फार केली. त्यांचे रुबरु आप्पानीही (खंडोबल्लाळनी) तशीच केली. चार पांच फिरंगी कासे (खासे?) तरवारीने ठार केले. हे राजेश्रींनी रुबरू पाहून यशस्वी होऊन आलीयावरी राजश्रींनी अप्पाशी पोटाशी धरून शाबासकी दिली. " -टीप १ पृ. २२६ प्रभुरत्नमाला.
(३) अप्पास पोटाशी धरून शाबास तुझी चिटणीशी तुजला बहाल वतनी असे. जा तुझे वंशास धंदे चालविणार नाही तो भोसल्याचा वीर्यज नाहीं असें बोलेन बहुमान केला. "
(४) गोव्याच्या स्वारीवर जाताना संभाजीच्या मागे कलमदान घेऊन धावत असतांना" अप्पास (खंडोबास) कळमळ येऊन रक्तवमन झाले. राजेश्रींनी मागे फिरोन पाहिले. दृष्टीस पडल्यावरी पालखी उभी करोन बोलावून आणोन मेहेरबान होवोन, स्वारीचा कोतवालापैकी एक घोडा बसावयास दिल्हा. तसेंच अप्पास एक नामी तरवार पण राजश्रीनी देऊन, दुष्टांचा समाचार चांगला घेण्यास तू उरू नको असे सांगितले.) वाचविले आहे. त्याने गोव्यानजीक कुंभार जुर्वे येथील लढाईंत छत्रपतीच्या तक्तासाठी तरवार गाजविली आहे. वसईच्या फिरंग्यावरली मोहीम याच प्रभू सरदाराने यशस्वी केलेली आहे. सन १६८५ त संभाजीची छावणी संगमेश्वरला असतांना, एका मुसलमान सरदाराने येसूबाईचा मेणा कब्ज करून नेला असतां, तिच्या सुटकेसाठी आणि पातिव्रत्यसंरक्षणार्थ खंडो बल्लाळने आपल्या मावस बहिणीचा संतुबाईचा बळी दिला आहे आणि संभाजी महाराजांना शेवटच्या कड्याबेड्या पडेपर्यंत वेळप्रसंग पाहून हरहमेष परिस्थितीची ओळख पटविण्यास न कचरणाऱ्या खंडो बल्लाळाने अखेर मोगलांनी घनि पकडतांच त्याचा कबिला स्वतः संरक्षण केला हीं व आणखी अशीच अनेक आणीबाणीची स्वामिकायें खंडो बल्लाळाने केवळ संभाजीच्याच कारकिर्दीत नव्हे तर शाहू महाराजांच्या राज्यारोहणापर्यंत करून, इतिहासाच्या प्रत्येक पृष्ठाला आपल्या स्वामीनिष्ठेचे पोवाडे गायला भाग पाडले आहे. ही सर्व पृष्ठे खोटी आणि राजवाड्यांची समजूत मात्र खरी! तेव्हा केसरीने म्हटल्याप्रमाणे मनूच खास बदलला म्हणायचा नाहीतर, ज्या गोष्टीचा निर्णय एकदोन वेळ नव्हे तर शेकडो वेळा तावून सुलाखून ठरला गेला आहे. त्याच गोष्टी उकरून काढून, राष्ट्रीय संघशक्तीच्या सध्यांच्या उत्क्रांत्यवस्थेत राजवाड्यांनी जातीजातीत वैमनस्य उत्पन्न करण्याचा देशद्रोही उपक्रम कशाला केला असता? चां. का. प्रभू समाजाला निष्कारण डिवचल्यामुळे आणि चित्पावनांच्या प्रस्तुत उन्नतीच्या आद्यजनकास ज्या ज्या समाजांनी (चा. का. व देशस्थ हाती धरून आश्रय दिला, त्यांच्याशी बेइमान झाल्यामुळे महाराष्ट्राला केवढ्या राष्ट्रीय आपत्तीखाली दडपून जाऊन स्वत्वपराङ्मुख व्हावे लागलें, याची तिळमात्र पर्वा न करता बेधडक वाटेल तो मजकूर बेगुमानपणाने छापण्याच्या धारिष्ट्याबद्दल भा. इ. सं. मं. ची करावी तितकी तारीफ थोडीच संभाजी महाराज व राजाराम साहेब यांचे कारकिर्दीत ग्रामण्य झालें नाहीं. यथास्थित चाललें. ही जुन्या बखरीची साक्ष आहे आणि कै. न्या. तेलंग यांनीहि ती सप्रमाण मान्य केली आहे. तर सामाजिक विषमतेचा जाच असहा होऊन कायस्थ संतप्त झाले तो जाच कोणता? शिवकालीन काय किंवा इतर कालीन कायस्थ काय किती झाले तरी ते आपल्या पुवान्याच्या चळवळीच्या अनुषंगानेच राहणार त्याचा तत्कालीन पुढारी म्हटला म्हणजे खडो बल्ला त्याच्याच विषयी न्यायमूर्ती पुढे म्हणतात
संभाजीच्या मरणानंतर तो राजारामाबरोबर जिंजीस गेला. ही सर्व मंडळी वेष पालटून जात असता बारीजय मोगल सुभेदाराने त्यांना ओळखून तो त्यांना पकडण्याच्या बेतात होता. इतक्यात खंडो बल्लाळाने जिवाची पर्वा न करता आपण मागे राहून आपल्या सोबत्यांस पुढे पाठवून दिले. त्या सुभेदाराने खंडो बल्लाळ यांस पकडून त्याचे हाल हाल("याच प्रसंगी खंडा बल्लाळचा मुलगा बहिरोजी यानें आपण बापाच्या ठिकाणी बसून त्याची मोंगलाच्या कैदेतून सुटका कशी केली व पुढे बहिरोबानें मोंगलांच्या अनेक अमानुष अत्याचारांना आपला बळी कसा दिला. ही हकीकत रा. रा. (आतां रावबहादूर) दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी `बहिरोबा` नामक पुस्तकांत समग्र वर्णन केली आहे. तें पुस्तक बाचकांनी एकवार अवश्य अवश्य वाचावे, अशी आमची शिफारस आहे. Forrest `s Selections, Vol. 1. p. 80 मधील खालील उतारा पहा :--"Khando Ballal Chitnis was arrested on his way to Jinji by the Moghals at Trivedi Arunachal. He induced the Hindu centry in charge of his cell to allow him to escape by substituting a man of similar features. His son Bhairoba offered to take his place and did so. Khando Ballal escaped and went to Jinji but the loyal; devoted son was murdered by Tarbiat Khan. Khando Ballal was the son of Balaji Avji alias Balprabhu who was also murdered for devoted loyal services. Bhairoba his grand son offered his life to ensure the success of his father`s plans for the relief of Jinji.") केले. तरीपण त्याची स्वामीनिष्ठा यत्किंचितही नाही. पुढे थोडया वेळानंतर त्याने जिजीतून राजारामाची सुरक्षितपणे सुटका होण्याचा सुयोग जुळवून आणला. मोंगलांचे सैन्यात काही मराठे सरदार होते. खंडो बल्लाळाने आपले कोकणातील वतन त्या सरदाराचे सर्वस्वी स्वाधीन करून त्यांशी स्नेहनाथ संपादिला व वरील सुयोग जुळवून आणला. शाहूराजे साताऱ्यास येऊन सिंहासनारूढ झाले तोपर्यंत खंडो बल्लाळ जिवंत होते. या युद्धांत विजयश्री मिळविलेला दुसरा प्रभु सरदार प्रयागजी होय. औरंगजेब बादशहाने स्वतः सैन्य घेऊन साता-यास पुष्कळ महिनेपर्यंत वेढा दिला होता. तेव्हा प्रयागजीने मोठ्या शौर्याने त्या शहराचे रक्षण केलें. "
संभाजीच्या वधानंतर रायगडावर इलायची वेगाने जी धरपकड केली आणि येसुबाई व बालराजे शाहू यांना दिल्लीस नेले. त्या वेळीहि (शिवाजीशी स्वराज्याची आणभाक करणाऱ्या दादजी नरसप्रभूचा मुलगा) कृष्णाजी देशपांडे, घरादाराचा आप्तकुटुंबाचा मोह सोडून राजमातेबरोबर दिल्लीस निघून गेला. अशी शेकडो उदाहरणं देता येतील.
यावर राजवाडे यांचे म्हणणे काय आहे? संभाजीच्या अ-सौम्य निर्णयावरून बिथरलेले प्रभुद्रोही कायस्थ मंडळ ते हेच काय नसेल तर ते कोणते? परंतु राजवाड्यांना प्रश्न विचारण्यात हाशील नाही. मुळातच जी कल्पित कादंबरी, त्याला ऐतिहासिक पुरावा तरी ते कोठला आणणार?
टणत्काराच्या पहिल्या आवृत्तीच्या परीक्षणसमयी ज्या अनेक समतोल वृत्तीच्या निस्पृह ब्राह्मण विद्वानांनी आपापले अभिप्राय प्रकट केले, त्यापैकी लष्कर ग्वालेरचे श्रीयुत माधवराव लेले. बीए. एल्सीई यांनी एप्रिल १९१९ च्या विविधज्ञानविस्तार` मासिकांत या मुद्याविषय प्रकट केलेले विचार येथेच उद्धृत केलेले बरे. श्रीयुत लेले म्हणतात :- संभाजीचा खून व तत्कालीन क्रांति प्रभू कायस्थांमुळे घडून आली नाहीं. ती घडुन येण्याला मुख्यतः संभाजीचा शिवाजीच्या वेळेपासूनच दिसून आलेला मुर्ख, क्रूर, विलासी अराजनिष्ठ व स्वेच्छाचारी स्वभावच कारण झाला व त्याच्यामध्ये त्याने राज्यावर येताक्षणी केलेल्या भयंकर अत्याचारांमुळे व पुढील पशुतुल्य वर्तनाने भर पडली.
शिवाजीच्या वेळची कर्ती मंडळी अर्थातच संभाजीसारखा नालायक मनुष्य राज्यपदावर येणें इष्ट नाहीं हें जाणत होती, त्या कर्त्या मंडळीमध्ये खरा एकोपा व दूरदृष्टी असती, तर संभाजीची कायमची वाट लावून टाकणे सुद्धां कठीण होते असे नाहीं. पण बाळाजी आवजीच्या सद्धेतूक पण अप्रासंगिक व अस्थानिक फाजील राजनिष्ठपणामुळे तो योग जुळून आला नाहीं. त्याच्या सारखा थोर व कर्ता पुरुष या कामांत पुढाकार घेता, तर संभाजीचे आक्रमण व कायमचे नियमन करणे कठीण पडलें नसतें. या प्रसंगी कायस्थ प्रभू त्यांच्या नेहमीच्या अंगी खिळलेल्या निस्सीम राजनिष्ठेला चिकटून राहिले. त्यामुळे त्या मऱ्हाठेशाहीवर तशा प्रकारचा कहर गुदरण्याला सवड झाली. कायस्थानी राजद्रोह केला नाही. उलट त्यांतील प्रमुख लोक संभाजीशी मोठ्या निष्ठेनें वागत गेले, हे सिद्ध आहे. (पू. १५२-१५३)
वरील अभिप्रायांत श्री. लेले यांनी पत्करलेली विचारसरणी कितीहि सरळ आणि स्पष्ट दिसत असली तरी तींत `राजनिष्ठपणा आणि राजकारणी मुत्सद्देगिरी` या विषयींच्या शिवकालीन कायस्थांच्या कल्पनांचा बराच विपर्यास व्यक्त होत आहे. त्याचा थोडा खुलासा करणें प्राप्त आहे. हिंदू समाज हा जात्या व्यक्तिमाहाल्याचा (Hero-Worship) भोक्ता असल्यामुळे कोणत्याहि निष्ठेकडे पाहण्याचा त्याचा चष्मा नेहमीच विकृत असतो. खुद्द आजच्या कायस्थाची राजनिष्ठेची व्याख्याहि अशीच भ्रष्ट व विपर्यस्त बनलेली आहे. शिवकालीन कायस्थाच्या व तानाजी प्रभृति मराठ्यांच्या राजनिष्ठेत व्यक्तिपूजेचा थोडा अंश असला तरी मुख्य आणि बराच भाग स्वराज्यनिष्ठेचा होता. ही गोष्ट पुष्कळ चिकित्सक विसरून जातात. शिवकालीन जनतेला स्वराज्य संस्थापक व्यक्तीचा आदर व प्रेमभाव वाटणें कितीहि निसर्गसिद्ध असले, तरी प्रत्यक्ष स्वराज्यभिमानापुढे ती व्यक्तीला महत्व देत नसे.
कायस्थ प्रभू हे प्रथम स्वराज्यनिष्ठ आणि नंतर छत्रपति ऊर्फ राजनिष्ठ असत. हे अनेक उदाहरणांनी सिद्ध करता येईल. सोयराबाईच्या कारस्थानाला विरोध केला व संभाजीचा पुरस्कार केला तो फाजील राजनिष्ठेने ` म्हणजे व्यक्तिमहात्म्याच्या स्तोमानें नव्हे. व्यक्तिमहात्म्य सोयराबाईच्या पक्षात होते. छत्रपतींची राजगादी म्हणजे भोसल्यांची वतनी जहागीर, त्यावर संभाजीला डावलून राजारामच बसवावा. असा या पक्षाचा कटाक्ष. बाळाजी या कटाक्षाच्या विरुद्ध. सोयराबाई पुढील त्याचें विधान (argument) असें मांडता येईल. ही भाषा आधुनिक आहे. रंगभूमीला शोभण्यासारखी आहे. तथापि बाळप्रभूच्या विरोधाचा आशय त्यावरून वाचकांना विशेष स्पष्ट कळेल. म्हणूनच या भाषासरणीचा अवलंब येथें करणें प्राप्त आहे.
मला संभाजी काय किंवा राजाराम काय, दोघेहि सारखेच. दोघांनाहि मी आवजी खंडूप्रमाणे कढी खांद्यावर खेळविले आहेत. पण मासाहेब, स्वराज्य संपादनाप्रमाणेच स्वराज्यवृद्धीच्या कामांत व्यक्तिमाहात्म्याचे प्राबल्य वाढले की, कार्याचा घात झालाच पाहिजे. ही गोष्ट दृष्टीआड करू नका. एवढीच माझी प्रार्थना आहे. राज्यावर संभाजी बसला काय, किंवा राजाराम बसला काय साध्या भोळ्या माणसांना आपल्या दृष्टीचे पारणें सारखेच फिटल्यासारखें वाटतें. पण प्रस्तुतच्या राज्याचा वारसा म्हणजे भोसले घराण्याचा खासगी मालमत्तेचा वारसा नव्हे.
छत्रपतींच्या भवानीच्या कृपेनें जन्माला आलेल्या या हिंदवी स्वराज्याच्या पायात हजारों इमानी मावळ्यांचे बळी पडले आहेत. शेकडो कुटुंबातल्या तरण्याबांड जवानानी आपले आत्मसमर्पण केले आहे आणि स्वराज्यासाठी झालेल्या आत्मयज्ञाच्या या मंगलकार्यासाठी मासाहेब, आपल्यासारख्या अनेक पुण्यवान मातांनी मोठ्या धैर्याने आपल्या सुनाची मंगळसूत्र कचाकच तोडून त्यांच्या कपाळची कुक स्वराज्याची गाणी गात आपल्या हातांनी पुसली आहेत, हे विसरू नका. छत्रपति है छत्राचे पति असले तरी छत्रपति म्हणून अखिल महाराष्ट्राला जबाबदार होते. छत्रपतीचे स्वराज्य म्हणजे भोसल्यांची जहागीर नव्हे. अवघ्या महाराष्ट्राची ती जहागीर आहे स्वराज्याचा प्रश्न सान्या महाराष्ट्राच्या अब्रूचा प्रश्न आहे. रायगडावर विराजमान झालेली ही स्वराज्याची गादी, मासाहेब महाराष्ट्रानें स्वयंस्फूर्तीने बळी दिलेल्या सहस्त्रावधि वीरांच्या रक्तावर तरंगत आहे आणि याची साक्ष मराठशाहीच्या झेंड्यांत भगव्या रंगाने उमटलेली आज सारी दुनिया पहात आहे.
व्यक्तिमहात्म्याच्या विरुद्ध असणारा बाळाजी राजकारणी दूरदृष्टीने संभाजीचा पुरस्कार को करीत होता, हेहि सिद्ध करणे फारसे कठीण नाही. शिवाजीचा राज्यभिषेक होऊन महाराष्ट्रांत पायाशुद्ध स्वराज्य स्थापन झालें ही गोष्ट जितकी खरी तितकीच ते बुडविण्याचे औरंगझेबाचे प्रयत्न विशेष जारी होते. ही गोष्टहि विसरता कामा नये. शिवाजीच्या अखेरचा काळ वरवर पहाणाऱ्याला मोठ्या शांततेचा व सुबत्तेचा दिसतो खरा पण वस्तुस्थिति अगदी उलट होती, स्वराज्यस्थापना सोपी गेली पण ते टिकविण्याचे काम मोठे बिकट व भयंकर, असा त्या वेळचा मामला होता राजाराम सुबुद्ध असेल, लोकप्रिय असेल. मनाचा कोंवळा सज्जन असेल अथवा मोठा विवेकीही असेल! नऊ वर्षांचे कोवळे पोरच ते त्याविषयी कोणी काय अंदाज बांधावा? अर्थात् हिंदवी स्वराज्य- किवसनार्थ अवरंगझेबाचे जे दांडगे लष्करी डावपेच सुरू होते, त्यांना तोंड देण्याची ताकद किवा अक्कल, विशेषतः मिलिटरी कमांडशिप संभाजीच्या आगी जितकी होती, तितकी कोणत्याहि हयात उच्च वर्णीय व कर्त्या पुरुषांच्या किंवा अष्टप्रधानादि घोडशाळेच्या आगी मुळीच नव्हती, हेहि जर बाळाजीला कळत नव्हते म्हणावे, तर तो चिटणीस तरी कसला, शिवाजीचा अंतरंगी दोस्त तरी कशाला झाला आणि सारी शिवशाही आमुलाग्र कशाला पारखली?
संभाजीचे लष्करी कौशल्य व सैनिकांचे त्याच्यावरील प्रेम खुद्द शिवाजीनें स्वतःच अनुभवलें होतें आणि पुढे १० वर्षाच्या कारकीर्दीत बऱ्हाणपुरापासून तो थेट गोव्यापर्यंत संभाजीने घातलेल्या घुमाकुळाने ते पूर्ण सिद्ध झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतहि, अवरंगझेब शिदी, पोर्तुगीज व इंग्रज यांना दे माय धरणी ठाय करणाऱ्या संभाजीने आपल्या स्वराज्याचा एक इंचभर तुकडा सुद्धा कधी चुकून गमावला नाहीं, ही कामगिरी कांहींच महत्वाची नव्हे काय? स्वराज्य टिकविण्यासाठी लष्करी बुद्धिमत्तेचाच छत्रपति पाहिजे. या बाळाजीच्या आग्रहातच त्याची राजकारणी दूरदृष्टी स्वच्छ दिसते. अष्टप्रधानांची नुसती बारभाई त्याला कमकुवत किंबहुना कारस्थानी अशीच वाटली. शिवाय, प्रधानमंडळाचा हा कमकुवतपणा संभाजी पन्हाळ्याहून निघताच त्याला सर्व सैन्यानें आपला छत्रपति मानून एकमुखी पाठबळ देतांच सिद्ध झाला. तेव्हा बाळाजीचे धोरण फाजील राजनिष्ठेचे किंवा अप्रासंगिक कसे? दुसरा प्रश्न असा उद्भवतो की अवघ्या नऊ वर्षाच्या कोवळ्या राजारामाला छत्रपति बनविण्यांत या भिक्षुकी प्रधानमंडळाचा हेतु काय? याना सैन्याचे पाठबळ नाहीं, स्वतःच्या मनगटांत लष्करी धमक नाही, फक्त भांडवल कारस्थानांचे व चहाड्याचुगल्यांचें! ब्राह्मण मंत्री आणि बालराजा ही जोडी जमली की तेथे आपोआप पेशवाई उमटते. नामधारी मत्ता बालराजाची खरी सत्ता या भिक्षुकी चाणक्यांची, या एकाच उद्देशानें मोरोपंतादि ब्राह्मण मंत्री सोयराबाईच्या कारस्थानांत सामील झाले होते. यांत स्वराज्यनिष्ठा तर नव्हतीच नव्हती. पण राजनिष्ठासुद्धां बेगडीच होती.
सवाई माधवरावाचें थेर माजविणारे बारभाईसुद्धा मत्ता पेशव्यांची सत्ता भटाभिक्षुकांची. याच क्षुद्र हेतुनें फुरफुरलेले होते. शिवाजीच्या मृत्यूनंतर प्रधानमंडळाचा हेतु की आता नऊ वर्षांच्या बालराजारामाला डोक्यावर चढवून, आपली भिक्षुकी सत्ता वाटेल तशी गाजविता येईल, तोच नाना फडणिसादि बारभाईचा हेतू सवाई माधवरावासारख्या २१ दिवसांच्या पोराला पेशवाई झूल चढविण्यांत होता. स्वतंत्र राज्ये कमाविण्याची ब्राह्मणांना कधींच अक्कल नव्हती व आतांहि नाही. उलट, ब्राह्मणेतरांनी कमाविलेल्या राजसत्तेचे भिक्षुकी कारस्थानाने तीन तेरा करण्यांत ब्राह्मणवर्ग मोठा निष्णात आहे. चालू घडीच्या ब्राह्मणांच्या स्वराज्यपुराणांत हाच हेतु गुप्त असतो, हे ब्राह्मणेतरांच्या तीट गळी उतरल्यास चालू स्वराज्यप्राप्तीच्या चळवळीचा तपशील फार निराळाच दिसू लागेल! सारांश, मराठशाहीतील बाळाजी प्रभूति कायस्थांची राजनिष्ठा ही व्यक्तिनिष्ठा होती, जेथे संभाजीच्याच खऱ्या चारित्र्याचा विपर्यास होऊन बसला आहे, तेथें बाळाजी आवजीची स्वराज्यनिष्ठा फाजील राजनिष्ठा ऊर्फ व्यक्तिनिष्ठा वाटणें साहजिक आहे. संभाजीच्या वधानंतर खंडो बल्लाळ व धनाजी जाधव वगैरे मंडळींनी कर्नाटकाचा जो प्राणांतिक वनवास भोगला, तो काय राजाराम व्यक्तिसाठी? संभाजीनें शिरक्याचें शिरकाण केले म्हणून गणोजी व राणोजी शिर्के भोसल्यांचे तळपट उडविण्याच्या हेतूनें मोंगलास मिळाले. व जंजीला राजारामास कोंडून धरला. शिर्क्याप्रमाणेंच चिटणिसांचेंहि चिटणिसान ऊर्फ कत्तल झाली होती, तरी खंडो बल्लाळ राजारामासाठी मरत होता तो काय खुळा म्हणून? अर्थात् नव्हे. राजाराम कोण? स्वराज्यांचे एक जिवंत प्रतीक. त्याचे नांव आणि स्वराज्याच गाव! लोकसत्तानुवर्ती इंग्लंडात जॉर्ज बादशाची जी आज किंमत आहे. तीच छत्रपति राजारामाची महाराष्ट्रांत होती. खंडो बल्लाळादि वीरांचे परिश्रम स्वराज्यासाठी होते, व्यक्तिसाठी नव्हते. किंवा स्वार्थासाठीहि नव्हते. जंजीचा वेढा फोडण्यासाठी शिक्यांची मनधरणी खंडोबानें केली, तेव्हां शिर्के म्हणाले जसें आमचे शिरकाण केलें तसें भोसले यांचा निर्वश झाल्यास चिंता नाही. हे फार चांगलें होतें. त्यावर खंडोबाने दिलेलें उत्तर या समयास तुम्ही बोलता हे योग्य नव्हे. तुमचे शिरकाण केलें तसेच आमचे तीन पुरुष हत्तीचे पायाखाली मेले, तेही गेले. परंतु हिंदूंच्या दौलतीकरितां आम्ही झटतच आहों. ज्यास जसा प्रसंग पडेल तसे झटत आहेत. (चिट ५५) या उद्गारा केवळ वैयक्तिक राजनिष्ठा आहे की व्यापक स्वराज्यनिष्ठा आहे, त्याचा वाचकांनीच निर्णय द्यावा.
संभाजीच्या चरित्रांत दुसरा एक विशेष आढळून येतो. तो हाच की राज्यसत्ता गाजवितांना त्यानें ब्राह्मण-ब्राह्मणेतर असला भेद मुळींच बाळगिलेला दिसत नाहीं. अपराध्यांना शिक्षा ठोठावताना त्यानें ब्राह्मणांचा मनुस्मृति प्रासादिक ब्रह्ममुखोत्पन्न पणा, विश्वप्रभू किंवा चितपावन पणा मुळीच न मानतां ब्राह्मणेतरांप्रमाणेच ब्राह्मणांनाहि सारखेच हतीच्या पायाखाली तुडविलें. आपल्या बापाने मटामिथुकांचे व फाजील स्तोम माजविलें होतें आणि वेदोक्त राज्यनिषेक तो काय, पण त्यासाठी भटांची केवडी मनधरणी व चांदी सोन्याचा त्यानें हकनाहक होम केला. हे संभाजीनें प्रत्यक्ष पाहून अनुभवले असल्यामुळे समजूत आल्यापासूनच [त्याला] ब्राह्मणांचा जन्मप्राप्त मानवी श्रेष्ठपणा, भूलोकचा देवपणा किंवा सर्वांगीण मुळीच मान्य नव्हता. शिवाजी ब्राह्मणांना पूज्य मानीत असे, तर संभाजी त्यांच्या मनुस्मृति प्रासादीक पूज्यत्वाला पूज्य किंमत देत असे. ब्राह्मण स्वतःला जरी प्रत्यक्ष भूदेव समजतच असत, तरी संभाजी त्यांना इतरांप्रमाणेच मलमूत्रजन्य माणसे समजत असे.
विशेषत: ब्राह्मणांची भिक्षुकी कारस्थाने शिवाजीच्या वेळी त्याने प्रत्यक्ष अभ्यासिली असल्यामुळे त्याची ब्राह्मणाविषयींची पूज्य भावना बाप हयात असतांनाच समूळ नष्ट झालेली होती. तरुण संभाजीने `बलात्कारें ब्राह्मणी भोगिली’ म्हणून त्यावर व्याभिचाराचा केवढा हलकल्लोळ तरुण राजे किंवा राजपुत्रावर फिदा होणाऱ्या स्त्रिया काय कधी नव्हत्या का आता नाहीत? आज देशी संस्थानात काय चालले आहे? काश्मिर इंदौरच्या भानगडी तर आता जगप्रसिद्ध आहेत. अहो, क्षुद्र नाटक्याच्याहि मागे लागणाऱ्या बटोर पोरीना आज दुष्काळ नाही तर राजवैभवी. तरुण, शरीराने भीम, अर्जुनाप्रमाणे धनुर्धारी असल्या संभाजीच्या गळ्यांत इतर शिवागीप्रमाणे मानवी विकारांची तरुण ब्राह्मणी पडली, तर त्यांत बिघडलें कोठे? ब्राह्मण देव म्हणून ब्राह्मणी देवी हे त्रयराशिक संभाजीला कोठे मान्य होते? तरुणतरुणीच्या काम्य वृत्तीत (मग त्याला व्याभिचार म्हणा की काय वाटेल ते नांव था।) उच्चवर्ण नीचवर्ण येऊच शकत नाहीत, संभाजीवर एखादी ब्राह्मण तरुणी फिदा झाली असेलच तर तो त्या उभयतांच्या प्रेमाचा प्रश्न. प्रेमांत लौकिकी भेदाचे कारण काय? वाटेल तर असेहि विधान मांडता येईल की राज्यकारभाराप्रमाणेच `लव्हाळ्यात सुद्धा सभाजी ब्राह्मण-ब्राह्मणेतर भेद मानीत नसे, मग एकट्या संभाजीवरच व्यभिचाराचा भडिमार का? तरी बरे. कल्याणच्या मुलाण्याच्या सुनेला आई मानणाऱ्या शिवाजीला एकदोनच नव्हे तर चार पट्टराण्या होत्या आणि संभाजीची माय एकच येसूबाई पट्टराणी होती! बाजीराव पेशव्यांची मुसलमान मस्तानी बिनतक्रार शनिवारवाड्यांत पचते आणि संभाजीची खरी खोटी ब्राह्मणी त्याच्यावर गहजबास कारण होते. हा ब्राह्मण-ब्राह्मणेतर भेद मनोरंजक आहे खरा सारांश, संभाजीला ब्राह्मणांचे श्रेष्ठत्य मुळीच मान्य नसल्यामुळे आणि तो आपली डाळ शिजू देणार नाही. ही मोरोपंतादिब्रह्माची खात्री असल्यामुळे सोयराबाईच्या कारस्थानाकडे एकदिलाने यापलीकडे त्यांना गत्यंतरच नव्हतें. यांत कसली स्वराज्यनिष्ठा आणि राजनिष्ठा?
यानंतर राजवाड्यांचा दुसरा मुद्दा असा आहे की `तद्नंतर दुसरी मोठी फिर्याद नारायणराव पेशव्यांच्या प्रधानकीच्या " वेळी झाली. त्यांत चांद्रसेनीयांनी भाताचे पिंड वगैरे न करता. शूद्र `यत् आचार करावे, असा निर्णय केला, तो कागदपत्री प्रसिद्ध आहे. " `शूद्रांना फक्त पांच संस्कार आहेत. व चांद्रसेनीयांना बारा आहेत,`असे गागाभट्ट म्हणतो. परंतु नारायणरावांच्या कारकीर्दीत चांद्रसेनीयाची पिछेहाट शूद्रत्वापर्यंत गेली. चांद्रसेनीयांच्या वेदा `धिकाराला नारायणरावाने व तत्कालीन काही ब्राह्मणांनी विरोध केला, त्याचा परिणाम असा झाला की रघुनाथराव दादाचा हस्तक जो सुमेरसिंग त्याच्या द्वारा नारायणराव जिवास मुकला व मराठेशाहीत पंचवीस वर्षे यादवी माजली कित्येक कायस्थ मित्रांच्या सांगण्यांत असे येतें की नारायणरावाच्या वधांत “कायस्थांचा” हात होता आणि हे सांगण्यातील अर्थ अगदी संभवनीय दिसतो.रघुनाथरावाचा जीव की प्राण म्हणजे सखाराम हरी गुप्ते, नारायण रावाच्या वधाच्या बाबतीत सखाराम हरीची सल्ला रघुनाथराव दादाला अवश्यमेव मिळाली असली पाहिजे. "
या उताऱ्यात राजवाडे ऐतिहासिक सत्याच्या जवळजवळ पण भीत भीत आले आहेत, ही गोष्ट आम्ही केव्हांहि अमान्य करणार नाही. पहिल्या उताऱ्यांत काल्पनिक विधानांच्या पृष्ट्यर्थ त्यांनी जो मुदाडपणा स्वीकारला आहे तो या उताऱ्यांत बराच पातळ होऊन ते ऐतिहासिक मुद्यांच्या नजीक येऊन ठेपले आहेत, तथापि त्यानी नारायणराव पेशव्याच्या वेळच्या चां. का. प्रभूंवरील ग्रामण्याच्या बखरी वाचण्याची जर थोडी तसदी घेतली असती निदान या प्रकाराबद्दल अलीकडील इतर विद्वानांनी ठरविलेल्या सिद्धांतांकडे ते जर क्षणभर लक्ष पुरविते, तर ऐतिहासिक मुद्याच्या इतके जवळ येऊनसुद्धा त्यांनी जी कित्येक अविश्वसनीय व निराधार विधाने प्रस्थापित करण्याचा यत्न केला आहे, तो करण्यास त्यांची मनोदेवता त्यांना सांगतीच ना.
शिवकालीन ग्रामण्यापासून तो चित्पावन नोकरशाहीची तळी उचलेपर्यंत चां. का. प्रभू समाजावर जी जी ग्रामण्ये झाली, त्यांत धार्मिक बाबतींपेक्षां त्यांच्या राजकीय वर्चस्वाच्या मत्सराचाच भाग अधिक होता. कायस्थांच्या संस्कारपद्धतीच्या विरोधापेक्षा त्यांच्या तत्कालीन् राजकारणांतील वर्चस्वाच्या ठेव्याचा भाग त्या ग्रामण्यांत अधिक होता हें एक तत्त्व पटल्यावर नारायणरावाच्या किंवा त्याच्या पुढच्या पेशव्यांच्या नोकरशाही अमधानीत कायस्थांवर धर्माच्या पांघरुणखाली झालेल्या छळाचे धागे आपोआप उलगडू लागतात.
****
भाग ४
मराठी राज्य स्थापन करतांना महाराष्ट्रातल्या सर्व जातींत जी संघशक्ती उत्पन्न झाली आणि तें राज्य लयाला जाण्यास त्याच संघशक्तीचे जे तुकडे तुकडे झाले, या दोन महत्वाच्या स्थित्यंतराच्या मध्यावर जर रेषा मारली तर ती रेषा पूर्व आणि उत्तर भागाची मूळ कारणें स्पष्ट दिग्दर्शित करील या दोन अर्धास विभागणारी रेषा म्हटली म्हणजे शिवाजीच्या वंशजांचे हातून राज्य नाहींसें झालें व शाहूमहाराज कैलासवासी झाल्यानंतर मराठा राजधानीचे ठिकाण सातारा येथून हालवून पुणे मुक्काम नेण्यांत आलें व अर्थातच सर्व सत्ता ब्राह्मण पेशव्यांच्या हातांत आली. हीच होय." असा शेरा न्या. रानडे देतात.
या दोन अर्थी स्पष्टीकरण करून, उत्तरार्धाबद्दल रावबहादुरांनी उद्गार काढले आहेत की, " पुढील साठ वर्षात राज्यकते पेशवे व एकंदर महाराष्ट्रांतील प्रजा यांच्या अंगची व्यंगे एकामागून एक दृष्टोत्पत्तीस येऊन इ. स. १८१७ मध्ये सर्व देश इंग्लिशांच्या ताब्यांत जाण्याच्या आधींच राष्ट्र कसे अगदी मोडकळीस आलें होतें हें चांगलें व्यक्त होतें. हे अंतर स्पष्ट कळलें म्हणजे, शिवाजीनें घालून दिलेली व त्याच्यामागून राजाराम व शाहू यांनी बऱ्याच एकनिष्ठपणे सुरू ठेवलेली जी तत्वे त्यांपासून पेशव्यांचे राजकीय धोरण कसे सुटत चालले राजनतीकडे दुर्लक्ष्य होऊन, आपणच काय ते श्रेष्ठ व आपण सर्वाहून निराळे अशा पुरातन ब्राह्मणी कल्पनेचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मराठा साम्राज्यवृक्षास कीड लागली व अखेरीस वृक्ष कसा समूळ उपटून पडला हें खास ध्यानांत येईल." चित्पावनांच्या एकमुखी नोकरशाहीच्या हाताची कारणे न्या. रानडे यांनी अशा रीतीने थोडक्यात परंतु स्पष्ट सांगतली आहेत. याच मताचा पुरस्कार आजपर्यंत झालेल्या प्रत्येक इतिहास संशोधकांने व विद्यार्थ्यांन एकमताने केलेला आहे. राजवाड्याच्या समजुती त मात्र हा मुद्दा नीटसा उतरत नाही. त्याला इलाज नाहीं, "जातीभेदाच्या प्रश्नावर मागे रणें पडली आहेत. पुढे मात्र ती पडता उपयोगी नाहीत. राजकीय परिस्थिति बदललली आहे. जातीनें श्रेष्ठ म्हणून राज्यकारभारांत वरिष्ठ नोकरी मिळण्याचा प्रश्नच उरला नाही. उलट सरकारी नोकरीतून अजीबात वगळले जाण्याचाच ब्राह्मणांवर प्रसंग आहे." याची पूर्ण जाणीव जाणून कै. प्रो. हरि गोविंद लिमये, एम्. ए. यांनी पेशवाईतला जातिभेद` म्हणून एक उत्कृष्ठ निबंध सन १९१४ च्या मनोरंजन- वसंत अंकात लिहिला आहे. त्यांत त्यांनी नारायणरावांच्या वेळच्या कायस्थावरील ग्रामण्याचे शक्य त्या निस्पृहपणाने सिंहावलोकन केले आहे. ते वाचकांनी पुन्हा वाचावे अशी आमची शिफारस आहे. त्यातील त्यांच्या काही विधानांना येथे जागा देणे न्याय्य होईल :
(१) केवळ गुणांवरूनच ब्राह्मण व प्रभू यांच्या समाजातील जागा ठरविण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर ब्राह्मण व प्रभू जवळजवळ एकाच ठिकाणी बसविता येतील, असा आमचा अंदाज आहे. कांही ब्राह्मणांचा नंबर पुष्कळ प्रभूच्या वर लागला. काही प्रभूंचाहि पुष्कळ ब्राह्मणांच्या वर लागेल. गुणांनी बहुतेक बरोबरी असल्यामुळे प्रभूना जातिनिर्बंध विशेष जाचक भासू लागले. त्यांतूनहि जेव्हां प्रभूंना अपमानकारक वाटतील, असे नवीनच निबंध घालण्यांत आले, तेव्हां प्रभुना चीड येणें स्वाभाविक होतें. पृ. ५४४.
(२) अशा पेशव्यांच्या (नारायणराव) कारकिर्दीत ब्राह्मण्याला ऊत येऊन ब्राह्मणपक्षाच्या पुढान्यांकडून अत्याचार व्हावा, हे स्वाभाविक होय. कित्ता.
(३) खरी राजसत्ता भोसले छत्रपतीकडून ब्राह्मण पेशव्यांकडे आल्यानंतर थोड्याच वर्षांत जातिप्रकरणांत ब्राह्मण शिरजोर झाले कित्ता
(४) छत्रपति शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेत महत्वाची कामे निरनिराळ्या जातीकडे वांटून दिलेली होती म्हणूनच त्या राज्यव्यवस्थेची आपण स्तुति करतो. परंतु पेशवाईत म्हणजे छत्रपति शाहू महारांच्या निधनानंतर आणि सर्व राज्यसत्ता ब्राह्मण पेशव्यांच्या हाती आल्यानंतर अशा प्रकारची व्यवस्था ठेवण्यांत आली नाही. ब्राह्मणांच्या अंगी बुद्धिमत्ता हाती, योग्यता होती, कर्तबगारी होती, त्यामुळे इतर जातींच्या अंगच्या गुणांचा विकास होण्याला किंबहुना ते गुण दृष्टोत्पत्तीला येण्याला देखील ब्राह्मणशाहीत अवसरच मिळेनासा झाला. कारकून ब्राह्मण वकील ब्राह्मण, प्रधान ब्राह्मण, मुत्सद्दी ब्राह्मण शिपाई ब्राह्मण, सरदार ब्राह्मण व खरा धनीहि ब्राह्मण असे सर्व ब्राह्मणमय झालें! पृ. ५४७.
‘जातिवर्चस्व’ सदराखाली लिहितांना न्या. रानडे यांनी हेच मत व्यक्त केले आहे :
जातिमत्सराचा इतका बडेजाव माजला की एक जूट होणे अशक्य झालें व राष्ट्रहिताच्या ऐवजी आपलीच तुंबडी भरण्याकडे प्रत्येक प्रबळ सरदाराचे लक्ष गुंतलें, यावेळी ब्राह्मणमंडळी म्हणजे अगदी तरं झालेली. खरे राज्यकर्ते आपण, आपणांस इतर जातीपेक्षा विशिष्ट हक्क व सवलती असावयास पाहिजेत असे ते समजत. शिवाजीच्या राज्यरचनेत या मूढ कल्पनांचा नुसता वाससुद्धा नव्हता. आता पेशव्यांकडे पहा. पेशवाईत दप्तर कचेरींतील हिशेबखातें ठेवण्याचे सर्व काम कोंकणस्थ ब्राह्मण कारकुनाकडे असे इतर कोणाचीही त्या खात्यांत नेमणूक होत नसे. त्या कारकुनांना पगारही मोठा असे असून यांनी बाहेर ठिकाणाहून धान्य किंवा इतर माल आणविला तर त्या मालावर जकात किंवा बंदरपट्टी मुळींच घेत नसत, कल्याण प्रांत व मावळ येथील जे जमीनदार ब्राह्मण लोक होते, त्यांचेकडून जमिनीचा सारा इतर जातींतील जमीनदारांच्या निम्यानें, कमीच घेत असत.
फौजदारी कोर्टात तर ब्राह्मणाला कायद्याची अगदी शेवटची म्हणजे देहांतशिक्षा देण्याचा कधींच परिपाठ नसे. उलट ब्राह्मण आरोपीला अशा शिक्षेविरुद्ध तक्रार करिता येत असे. किल्ल्यामध्ये जरी त्यांना कधीकाळी तुरुगांत ठेविण्यांत आले तरी, इतर जातीतील कैद्यांपेक्षा यांना जास्त उदारपणाने वागविण्यांत येई. इतक्या सवलती असून शिवाय ब्राह्मण जाति फार पवित्र म्हणून त्यांना धर्मादाय करण्याच्या कामी सरकारचा (पेशवे) सढळ हात असे. "
म. स. उ. पू. १८७-१८८.
राजकीय कैद्यांच्या वागणुकीबद्दल इंग्रजी नोकरशाहीला दोष देणाऱ्यांनी या स्वदेशी चित्पावन नोकरशाहीचा याबद्दलचा इतिहास मुद्दाम पहावा. म्हणजे ज्याच्या हाती सावज तो शिकारी आणि बळी तो कानपिळी हा निसर्गाचाच नियम असल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यांतील कुसळावर टीका करण्यापूर्वी आपल्या डोळ्यांतील मुसळाच्या टीका वैद्याकडून काढवून घेणें किती आवश्यक आहे, हे कळून येईल. पेशव्यांचे ब्राह्मणकैद्यांबद्दलचे पक्षपाती वर्तन वर दिलेच आहे. याच्या उलट कायस्थ प्रभू राजकीय कैद्याबद्दल वर्तन पहा.
`किल्ले मजकुरी सखाराम हरी (गुप्ते) अटकेंत आहे त्यास पोटास शिधा मागत आहे तो मना करून जुन्या नागलीचे पीठ दररोज वजन पक्के १ एकशेरप्रमाणे देत जाणें पीठाशिवाय आणीक कांहीं न देणें. उपास करू लागल्यास करू देणें मनास न आणणे, नवीन बेडी पाठविली आहे ती सखाराम हरी याचे पायांत घालून पक्के बंदोबस्ताने ठेवणें, " (भा. इ. सं. मं. ४ अहवाल पृ. १३८) न्या. रानडे पूढे म्हणतात. सखाराम बापू (बोकील) एकवेळी पेशवाईच एक आधारस्तंभ होते. पण त्यांनी राघोबादादांची बाजू उचलल्यामुळे त्यांना किल्ल्यामध्यें अटकेत ठेविलें. दादासाहेबांचे इतर स्नेही बहुतेक प्रभु ज्ञातींतील होते रघुनाथ हरि बाबुराव हरि इत्यादि लोकांचीहि तीच स्थिति झाली. " (म. स. उ. पृ.२०५).
चित्पावन नोकरशाही उर्फ पेशव्यांची पेशवाई हिच्या एकतंत्री राज्यव्यवस्थेचे न्या. रानड्यांनीनी काढलेलें हें स्पष्ट चित्र तत्कालीन चित्पावांच्या शिरजोरपणाला बेधडक चव्हाट्यावर आणीत आहे. मेल्या म्हशीला दूध फार या न्यायाने पेशवाईचे पोवाडे गाणाऱ्यानी पहिल्या प्रथम आपल्या पायाखाली काय जळत होते हे स्पष्ट उघड करून दाखविणाऱ्या या उताऱ्याचे नीट मनन करायें. अशा या विगत नोकरशाहीने चित्पावनेतर अनेक जातीवर त्यावेळी जे अनेक अमानुष जुलूम केले, त्याचा इतिहास जर वाचला तर नारायणराव पेशव्याच्या नोकरशाहीत चां. का. प्रभु " शुद्रत्वापर्यंत पोचले, "इतर जातीप्रमाणे अगदीच हतवीर्य किंवा नामशेष झाले नाहीत, ही एकच गोष्ट त्यांच्या क्षात्र वीर्याची साक्ष देण्यास पुरेशी आहे.
मराठी इतिहासाचे विहंगमदृष्ट्या जरी समालोचन केलें तरी कोणालाहि एक गोष्ट प्रामुख्याने आढळून येईल की छत्रपतीच्या तक्ताशी राजनिष्ठेच्या शपथा वाहणारे कायस्थ प्रभू पहिल्यापासूनच पुण्याच्या नोकरशाहीच्या विरुद्ध होते. पहिले दोन चित्पावन पेशवे छत्रपतीच्या तक्ताला विरोध (वास्तविक सातारकर छत्रपतींना निर्माल्यवत करून स्वतः ची स्वतंत्र सत्ता प्रस्थापित करण्याची बुद्धि पहिल्या बाजीरावांतच बीजरूपाने उत्पन्न झाली होती. मुंबईच्या ब्रिटीश वकीलाने २० जुलै सन १७३७ रोजी अशी नोंद करून ठेवली आहे की " That from the best intelligence procurable there appears no reason to doubt of Bajirao`s disregard of any subjection to the Shahu Raja, whom he acknowledges for form`s sake, whilt his views tend apparently to fortify himself in a state of independence on him, of which the Shahu Raja himselt does not seem ignorant." (2) "The sentiments of most of the principal men are that Bajirao has in view to throw off (Forrest`s Selections p. 83.) his allegiance to the Raja." (Ibid 10).) न करितां वागले, म्हणून छत्रपतीच्या खास विश्वासातल्या कायस्थ प्रभू सरदारांना त्यांच्याशी विरोध करण्याचे साहजिकच कांही कारण नव्हते. परंतु बाजीराव बल्लाळाच्या मागे त्यांचे चिरंजीव!(रा. रा. पांगारकर आपल्या "मोरोपंत चरित्रात (पृ. ५९) तिसरे पेशवे नानासाहेब य लिहितात - xxx याप्रमाणे कुटील नीतीने वागून राष्ट्रांत केवळ स्वार्थासाठी भयंकर फूट पाडणाराजांच्या सहायाने कान्होजी आंग्र्यांचे आरमार बुडवून इंग्रजास कोकणपट्टी मोकळी करून देणारा व खुद आपल्या स्वामीशी द्रोह करणारा नानासाहेब हा मराठेशाहीच्या भव्य प्रासादाला आग लावणाऱ्या पुरुषाचा अग्रणी नव्हे काय? राजधा इतिहासशास्त्रज्ञानी इतिहास विकृति करणारा मलीन चष्मा एकीकडे ठेवून शांत चित्ताने व खऱ्या महाराष्ट्रीय दृष्टीने याचा विचार करावा.
टीप : (काव्येतिहास संग्रह ले. ४२८) शाहू महाराज यांचा जीवात्मा आहे तो बाह्यात्कारी त्यांचे सेवक" हें खुद नानासाहेबाच्या तोंडचे वाक्य मोरोपतहिनामार्या प्रकरणांत पर्याय सुचवून म्हणतात - त्रिभुवनराज्य प्रभुचें प्रतिनिधिनें त्वां स्वहस्तगत केलें । भोळ्या दिगंबराचें आक्रमिलें वतन जळ जसे तेलें ॥ १०२ ॥)
नानासाहेब जेव्हा साताऱ्याहून पेशवाईची वस्त्रे घेऊन आले. तेव्हांपासून छत्रपतीना निर्माल्यवत करणाऱ्या चित्पावन नोकरशाहीच्या एकतंत्री अरेरावपणास खरी सुरुवात झाली. कोकणातल्या चित्पावनांची पार्सले यांच्याच अमदानीत बोरघाट चढली. चिटणीशी वळणावर जनोबाभट्टीचे तट्टू याच पेशव्याने चढविले, पानपतच्या मोहिमेंत मिळालेल्या अपयशाच्या खापरांत घरगुति कलहाचें पर्यवसान झाले. ते यांच्याच राजवटीत, राघोबादादा आणि पेशवे अशी खुदपुण्यातल्या पुण्यांत दुफळी माजली आणि हजारों चां. का. प्रभू लढवय्यांचा आणि सरदारांचा पुण्यांत भरणा असूनसुद्धा पानपतच्या मोहिमेवर फारच थोडे चां. का. प्रभू गेले. चित्पावन नोकरशाही आणि छत्रपतिनिष्ठ कायस्थ प्रभू यांच्यातील खऱ्या राजकीय विरोधाची सुरुवात याच तिसऱ्या (१) नानासाहेब पेशवे हे कायस्थप्रभूंवर ग्रामण्य करण्याच्या कारस्थानाच्या अगदी विरुद्ध होते; तथापि त्यांची प्रभूशी राजकीय बाबतीतीली स्पर्धा आणि द्वेष अत्यंत तीव्र असे.
"The Peshvas raised their own people to high offices and did all they could to undermine the influence of their rivals the Deshasthas and the the friends of that community the Prabhus, which resulted in the fall of the Maratha power."
Grant Duff-Appendix. iv (२) शिवाजीच्या कारकीदीत ज्या प्रभूजातीच्या लोकानी अलौकिक कृत्ये केली, त्यांचे वंशज बाळाजी बाजीरावच्या कारकीर्दीपासून अगदी मार्गे पडत चालले. " न्या. रानडे,
(३) खुद्द राजवाडे आपल्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ६ वा पृ ५४६-४८ वर काय उतारा नमूद करतात ते पहा :- पेशव्यास राजधानी प्राप्त झाल्यावर, संपूर्ण ब्राह्मणमंडळी वेदविद्या अधीत क्षत्रिय चांद्रसेनीय लेखनविद्येत प्रवीण उदरनिर्वाह करून होते : सबब बराबरीने वागले. चांद्रसेनीय थोडे, ब्राह्मण फार, म्हणून द्वेष वाढला; परंतु कर्मलोप जाहला नाहीं) पेशव्याच्या कारकीर्दीत झाली, ती आजतागायक आमच्या माननीय राजवाड्यापर्यंत सरळ रेषेत वंशपरंपरेनें उतरत आली आहे. चवथे पेशवे माधवराव यांच्या कडक अंमदानीत ग्रामण्याचे दिवटे घेऊन नाचणारी आशाळभूत चित्पावन पिशाच्चें अंधारात डोकी खुपसूनच होती परंतु माधवरावाचा क्षय उन्मत्त होऊन आणि व्यभिचारी नारायणरावाची स्वारी नोकरशाहीच्या अरेरावी दंडाचे मालक होताच. ही भुते पुनश्च सैरावैरा बोकाळू लागली. सातारकर छत्रपती या पेशव्याला पेशवाईची वस्त्रे देण्यास नाखूष होते. याचे कारण स्पष्टच आहे. साताऱ्याला निर्माल्यवत् करून टाकणान्या पुण्याच्या या एकमुखी नोकरशाहीची सत्ता त्यावेळी खुद्द छत्रपतींना सुद्धा फार जाचक झाली होती. अर्थात पेशवाईची वस्त्रे भट घराण्यांतून अजीबात काढून ती दुसऱ्या कोणा लायक मुत्सद्यास देण्याचा विचार छत्रपतीनी करणें केव्हांही वाजवी आणि न्याय्यच होते. परंतु नारायणरावानें उद्दामपणाने खुद्द छत्रपतीला जास्त मिजास कराल तर साताऱ्याचे तक्त खालसा करून ते पुण्याच्या तक्ताला नेऊन जोडीन" अशी धमकी देऊन बळजबरीने पेशवाईची वस्त्रे साऱ्याहून आणली. तिची हकिकत जुन्या बखरी येणेप्रमाणे देतात -
नारायणराव बल्लाळ वस्त्रे घेण्याकरिता सातान्यास आले. वस्त्रांसमयी मनोदयानुरूप काही मतलब महाराजांचे करून द्यावे असे ठरावात असतां, नारायणरावाचा जातीनें शरीरसामर्थ्य व तारुण्यमद प्रकृत ही उद्दाम असा गर्विष्ठ स्वभाव होता त्यायोगें वस्त्राचे समयी काहीएक व्हावयाचे नाही म्हणोन उरुबुरू बोलले. यावरून महाराजांची मर्जी जाऊन शिव्या देऊन वस्त्रे देत नाही बोलले. वक्तास लावून घेऊ असे यांणी उत्तर केलें, यावरून महाराजांच्या मुखांतून शब्द निघाले जे माजोऱ्या निसंतान होऊन मरशील. तुझे वाटोळे होईल. हा श्राप झाला. आणखीही फार श्राप करून बोलले, नारायणराव यानी वस्त्रे तशींच घेतली. शके १६९४ नंदननाम संवत्सरे सन सल्ला सबैन मार्गशीर्ष मास.
अन्नदात्याशी निमकहरामपणा केल्याबद्दल आणि मराठी राज्याच्या तक्ताधिपतीशी उघड उघड द्रोह केल्याबद्दलचे प्रायश्चित नारायणरावाला कसे मिळाले. ते बखर पुढे सांगते :
"वस्त्रे घेऊन दरवाज्याबाहेर निघतांच मशालेची बत्ती झग्यास लागून झगा पेटला. आणखी अपशकून पुढे हत्तीजवळ गेले. जरीपटका हत्तीवर होता. जरीपटक्याची काठी मोडून तो खाली पडला. दोन अपशकून झाले. नंतर पुण्यास आले."
नारायणरावाची उन्मत्त स्वारी पुण्यास आल्यावर त्याचे वर्तन कसे होते याबद्दल जुन्या बखरीची साक्ष खाली दिल्याप्रमाणे आहे. राजवाडे प्रमृतीच्या समजुती` ची साथ कशीही अस `फारच अविचारी वागणे उन्मादपणा राज्यमदेशी वागू लागला. लोकांच्या स्त्रिया चांगल्या त्यांवर बलात्कार हळदकुंकवास नेऊन करावा, अगर बातमी लागल्यास पालखी पाठवून जबरी
करावी, सातार संस्थानची निंदा करावी. असा फार अविचारपणा आरंभिला. व प्रभु ज्ञातीवर ग्रामण्याचा प्रारंभ केला. व्याभिचाराबद्दल केवळ रावबाजीनाथ कांही दोष द्यायला नको दुर्वर्तनाचा पाया त्यांच्या पूर्वीच्याच पेशव्याने घातलेला होता, सिद्ध है व्हायला आणखी काही शिंगे राहिली नाहीत
के. प्रो. लिमये म्हणतात --
`नारायणरावांचा जो क्रूरपणे खून करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या दोषांकडे दुर्लक्ष्य करून त्यांना अनुकूल असे मत बनविण्याची स्वाभाविक प्रवृति असते परंतु या पेशव्यांच्या साडेनऊ महिन्यांच्या कारकीर्दीत त्यांनी ज्या गोष्टी केल्या, त्यांचे सूक्ष्म रीतीने निरीक्षण केल्यास त्यांच्या ठिकाणी मुत्सद्दीपणाचा पूर्ण अभाव होता. असे स्पष्ट दिसते, त्यांचा स्वभाव फार उतावळा य हेकट होता ते हलक्या कानाचे होते. जुन्या, अनुभवी व पोक्त कारभान्यांचा उपमर्द करण्यास अगर परिणामाचा विचार न करितां आपला हेका चालविण्यास त्यांना बिलकुल दिक्कत वाटत नसे, थोरल्या माधवरावांच्या लक्ष्यात आपल्या धाकट्या बंधूचे हे दोष कधीच येऊन चुकले होते, वयाचे कपाळी राज्य नाही असा शेराहि त्यांनी मारून ठेविला होता. मनोरंजन वसंत अंक १९१४.
* Forrests Selection`s Vol. Part II p. 25 नामक पुस्तकांतील विल्यम् टेलर यांचेहि उद्गार असेच आहेत. पहा :--
Had Naraynrao possessed the least degree of prudence, he might have remained secure in the Peshwaship. For though by the instigation of his mother (Gopikabai) and the choice he had made of confidents he had created himself a deadly enemy in the Diwan Sakharam Bapu; yet the influence and abilities of the Phadnis Nana and Morobe and their adherents were more than a counterpoisa to him. But without the least share of judgment and wholly devoted to low vices and pleasures, Naraynrao paid not the least regard to any one, on the contary he behaved in so senseless, imperious and disgraceful a manner even to the ministers in his own party that they became lukewarm in his iterest and in time suffered him to fall a sacrifice to the machinations of his enemies."
असल्या व्याभिचारी, बदफैली आणि दुर्व्यसनी पेशव्याने कायस्थ प्रभूवर ग्रामण्य काय किंवा इतर दुसरा छळ काय, केला नसता तरच आश्चर्य मानायला काही जागा होती. ज्या कृतघ्न नराधमाने छत्रपतीच्या तक्ताची व प्रत्यक्ष छत्रपतीचीहि निर्भत्सना करण्यास मागेंपुढे पाहिलें नाही, त्यानेच कायस्थ प्रभूवर ग्रामण्यासारखे जुलूम करावे, यांत विशेष ते काय? पण राजवाड्यांना पेशव्यांचे सर्वच काही विशेष " वाटतें स्वाभिमान कोणाला नसावा असें आमचं मुळीच म्हणणे नाही आणि राजवाड्या सारख्यांच्या आगी तो जागृतावस्थेत सदैव चमकत असतो. याबद्दल केव्हाहि झाले तरी ते स्तुत्यर्हच आहेत, परंतु त्याच स्वाभिमानाची मर्यादा फाजील क्षेत्र व्यापू लागली आणि स्वतः चे काळेकुट्ट दोष दुसऱ्याच्या माथी मारून त्याला कुत्सित बुद्धीने निराधार पातकांचे धनि बनविण्याचा उपद्व्याप सुरू झाला की त्या वृत्तीला स्वाभिमान म्हणण्यापेक्षा पशुवृत्ति म्हटले तरी चालेल. चित्पावन नोकरशाहीच्या हातून घडलेल्या राष्ट्रविध्वंसक अनन्वित पातकांवर पांघरूण घालण्याच्या भरात आमची राजेवाडेप्रभूति मंडळी आली म्हणजे सारासारा विचारांचे गाठोडे खुटीला अडकवून शेजाऱ्यांच्या घरावर ती कशी धोंडे मारण्याचा उपक्रम करतात. हे राजवाड्यांच्या या आक्षेपित लेखावरून समजण्यास अडचण पडणार नाहीं. स्वामिद्रोहाच्या बाबतीत चित्पावन नोकरशाहीनें आपल्या दुष्कीर्तीचा जो टोलेजंग पिरामिड उभारून ठेवला आहे. तो एकदाच दृष्टीआड सृष्टीआड कसा करता येईल ही आमच्या आधुनिक चित्पावन बंधूंस फार काळजी लागली आहे. परंतु दुर्वर्तनाची काजळी सद्वर्तनाच्या सफेधीने बुजवून टाकण्याचा राजमार्ग त्यांनी न पत्करिता पूर्वापार वहिवाटीप्रमाणे त्याच काजळीचे शितोडे इतर समाजांवर उडविण्याचा त्याचा उद्योग पाहिला की त्यांच्याबद्दल अत्यंत तिरस्कार येतो.(सन १८५१ साली मि. ए. मॅक्डोनल्ड नामक गृहस्थानें नाना फडणीसाचे चरित्र` नामक जो एक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथ लिहिला आहे. त्यांत (पृ. ६१) त्यांनी चित्पावनांना दिलेले सर्टिफीकीट सध्यांच्या राष्ट्रीयवाल्यांनी आपल्या चरित्रशीं ताडून पहावे.
"The Mahratta Bramin is, from diet, habit and education, keen, active and intelligent but generally avaricious, and often treacherous. His life, if in public business must from the system of his Government be passed in efforts to deceive, and to detect others in deceiving. Such occupations raise cunning to the place of wisdom, and debase by giving a mean and interested bent to the mind, all those claims to respect and attachment upon which great and despotic power can alone have any permanent foundation. The history of the Mahratta nation abounds with instances of Bramins rising from the lowest stations to be ministers, and sometimes rulers of a state; but their character undergoes little change from advancement, and in general, all its meanest features remain ; though often leading armies, the Mahratta Bramins have not, with some remarkable exceptions, gained a high reputation for courage; and if arrogant cruel, they have often merited the charge of being unfeeling and oppressive.)
****
भाग ५
येन केन प्रकारेण चां. का. प्रभूंवर साम्राज्यद्रोहाचा आरोप शाबीत करण्याच्या कामी राजवाड्यांचा अट्टाहास किती जाज्वल्य आहे तो आता आणखी विशद करून सांगायला नकोच. त्यांनी या अट्टहासाच्या वेडाच्या लहरीत प्रथम १२ वर्षांच्या संभाजीच्या गळ्यांत कमिशनरशिपचे लोंढणेहि अडकविण्यास मागेपुढे पाहिले नाही. आता राजवाडे म्हणतात की `कित्येक कायस्थ मित्रांच्या सांगण्यांत असें येते की नारायणरावाच्या वधांत कायस्थांचा हात होता आणि हें सांगण्यांतील अर्थ अगदी संभवनीय दिसतो. " या उता-यावरून एवढेच सिद्ध होत आहे की मोठमोठी जीर्ण गळाठी हुडकणाऱ्या राजवाड्यांना काय किंवा बुरख्या बुरख्यामधून त्यांच्याशी कानगोष्टी करणाऱ्या त्यांच्या आत्मद्रोही कायस्थ मित्रांना काय, या प्रकरणाचा लागावा तितका सुगावा अझून लागलेला नाही खास साऱ्या गोष्टी आणि पुरावे सांगोवांगी च्या संभवावरच अझून डळमळत आहेत.
कायस्थ प्रभूनी राघोबादादाचा पक्ष स्वीकारल्यामुळे चित्पावन नोकरशाहीच्या दाराची आणि त्यांच्या बगलबच्या मुत्सद्यांची कायस्थ प्रभूवर करडी नजर असावी यांत विसंगत असे काहीच नाही. नारायणराव पेशव्याच्या वेळी चित्पावन आणि कायस्थ यांचा तंटा विकोपास गेला होता ही गोष्ट इतिहासप्रसिद्धच आहे. परंतु शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीपासून स्वार्थत्याग करण्यात अग्रेसरत्व पटकविणाऱ्या हिंदवी स्वराज्यवृद्धीस अडथळा आणणाऱ्या गणोजी शिवर्याला आपली स्वतःची वतनी जहागीर बहाल देऊन स्वतः कफल्लक बनणाऱ्या आणि वेळोवेळी चित्पावन पेशव्यांच्याहि हिताकरिता अनेक संकट करणाऱ्या कायस्थ प्रभूंच्या वंशजांच्या हातून खुनासारखे नीच कृत्य होणे शक्य असेल काय, याबद्दल राजवाडे समाजशास्त्र्यानी जरा किंचित् पोक्त विचार करावयास पाहिजे होता. खुनासारखी अमानुष कृत्ये करण्यास निरढावलेल्या समाजांची पूर्वसंस्कृति आणि पूर्वेतिहास तितकाच घातकी आणि राक्षसी असावा लागतो. हे साधे स्वानुभवाचे तत्व या समाजशास्त्रीबुवांच्या लक्षात यावयास पाहिजे होते. समाजशास्त्र गुंडाळून ठेवले आणि नुसता इतिहासच घेतला तरी काय सिद्ध होत आहे?" व्रणार्थ पशुच्या शिरावर सदा उमे काकसे अशा आमच्या चित्पावन बंधूंना असा काही ऐतिहासिक पुराव्याचा एखादा तुकडा जरी सापडता तरी ते आज आकाशाहूनही उच झाले असते, परंतु अत्यंत आश्चर्याची गोष्ट ही की डोळ्यांत तेल घालून जुन्या दप्तरांची बार्ड संशोधन करणाऱ्या एकाही इतिहास संशोधकाला असला ऐतिहासिक पुरावा असून मिळालेला नाही! चित्पावन बुद्धिमंद नाहीत, तेव्हा या भयंकर प्रकरणात जर कायस्थांचा खरोखरच काही हात असता तर तो त्यांनी कधीच झांकला जाऊ दिला नसता. परंतु नुसत्या तर्कवादावरच इतिहासाची भली मोठी विश्वामित्री सृष्टी वेळोवेळी निर्माण करण्याचे बाळकडू मिळालेल्या राजवाड्यांना कित्येक कायस्थ मित्रांचे सांगणे हा एवढाच धागा.
कायस्थ प्रभूवर खुनाचा आरोप
करण्यास पुरेसा वाटावा, यात आश्चर्य ते कसले? मंडळापुढे ज्यावेळी राजवाड्यांनी आपला हा दिव्य निबंध वाचला त्यावेळी नागपुरकर भोसल्याची बखर प्रसिद्ध करणारा रा. ब. साने हे अध्यक्ष होते. या त्यांच्या बखरींत नारायणराव पेशव्याने राघोबादादा आणि आनंदीबाई यांच्यावर केलेल्या अमानुष छळाचें वर्णन दिलेलें आहे. पांच दिवसपर्यंत राघोबादादाला अंधारकोठडीत उपाशी कोंडून हेविलें होते आणि लुगड्यात काही कागदपत्र लपवून ठेवू नये म्हणून आनंदीबाईलाहि नेसावयास वस्त्र न देता नग्न (मग दादासाहेबांचा बंदोबस्त करून ठेविला. देवपूजा करू देऊ नये, की या योगाने माझा भाऊ मारला असे महणीम खोलीत ठेविले दादासाहेब अर्ध्या प्रदान सूर्यदर्शन घेतल्याविना अन्न भक्षू नये हा नेम होता. खोलीत राहिल्यामुळे पांच उष जाहली व दादासाहेबांचे स्त्रियेस लुगडयांत फंदाजे कागद लपविले या निमित्याने लुगडें फेडून छळणा करावी.
रा. ब. साने संशोधित- नागपूरकर भोसल्यांची बखर) स्थितीत तिचा बराच छळ करण्यांत येत होता. वगैरे माहिती रावबहादुरानी संशोधन करून छापलीच आहे. राजवाडयांनी का. प्रभूपर नारायणरावाच्या खुनाचा आरोप करणारा आपला निबंधवेद वाचतांना त्या माहितीची त्यांना आठवण होऊ नये हे मोठे चमत्कारिक दिसते. खून झाल्यानंतर सुमेरसिंगाला तोफेच्या तोंडी देणारे चित्पावन नोकरशाहीचे बिरबल नाना फडणीस खुनाच्या आदल्या रात्रींच पुण्याहून बाहेरगांवी घालते झाले होते आणि इकडे खून होत असतांना सासवडच्या पुरंदऱ्याकडे स्वारी मेजवान्या झोडीत बसली होती.
उडत्या पांखरांची पिसें मोजणारे, पुण्यांतील स्वतःच्या घरांतील भिंतीला कान देऊन हैद्राबादच्या निजामाच्या रंगमहालातल्या गोष्टी ऐकणारे, हे खूप शर्तीनें राज्य राखणारे यशवंत फडणीस नाना खुनाच्या आदल्याच रात्री बिनचूक पुणे सोडतात, तर खुनाच्या कटांत खुद नाना फडणीसाचेंच आंग नव्हतें, हे तरी कशावरून? सारांश, या प्रकणात बाजारगप्पांच्या आधारानें कायस्थ प्रभूंवर खुनासारखा आरोप करणें, हे अत्यंत निंद्य व नीच कृत्य होय. यापेक्षा तीव्र अर्थाचे विशेषण मराठी भाषेत आह्यांला सांपडत नाही. नाना फडणीसानें कटातील सर्व अपराध्यांना शिक्षा ठोठावल्या, त्यांत एकाही कायस्थाचें नांव नाहीं. सखारामबापू बोकीलालासुद्धा कैद केले होते. मग नाना फडणीसाने कायस्थांना मुद्दाम वगळले होते की काय? तात्पर्य हे सर्व थोतांड असून कायस्थांचा तेजोभंग करण्याकरितां ते रचलेलें आहे! कायस्थाचा या खुनाशी काही संबंध जोडण्यांत नाना फडणीसाच्या चातुर्यावर काजळ फासलें जाते ही गोष्ट चित्पावन विसरून जातात. बाकी, चित्पावनांप्रमाणे कायस्थ प्रभू साम्राज्यद्रोही किंवा खुनी ठरत असल्यास नाना फडणीसाच्याचशा काय, सान्या पेशव्याच्याहि तोंडाला काजळ फांसण्यास तयार होण्याइतके ते स्वार्थत्यागी आहेत हे आम्ही जाणून आहोत, नारायणरावाच्या यधाच्या बाबतीत सखाराम हरीची सल्ला रघुनाथराव दादाला अवश्यमेव मिळाली असली पाहिजे असलें छातीठोक घाशीरामी विधान करतांना नाना फडणीसाच्या इतिहासप्रसिद्ध अकलेपुढे आपल्या स्वतःच्या अकलेचे तट्टू धांवडण्याची राजवाड्यांना स्फूर्ति झाली असें दिसतें.राजवाड्यांच्या आंगीं नाना फडणीसावें फडणीशी चातुर्य मुळींच नाहीं असे नाही पण खुनासारख्या भयंकर वादग्रस्त प्रश्नाचा निकाल लावण्याच्या कामी नानाच्या अकलेवर सरशी करण्याचे त्यांचे धाडस पोरकट दिसतें, सखाराम हरी किंवा त्याच्या पुढारपणाखाली असलेलें का. मंडळ यांचा जर खुनांत कांहीं प्रत्यक्ष संबंध असता तर राघोबा आणि आनंदीबाई यांना जात्यांत भरडून काढण्यात ज्या मानानें मार्गे पुढे पाहिलें नाहीं त्यानें त्यावेळी कर्तुमकर्तुम् ; अन्यथा अकर्तुम् अशी सत्ता हाती असतांना कायस्थांचा किंवा सखाराम हरीचा मुलाजा राखला असता काय? उलट खुनाच्या क्रांतीनंतर जे प्रधानमंडळ बनविण्याचे राजकारण नाना व महादजी यांनी केलें त्यांत सखाराम बापू मोरोबा फडणीस व सखाराम हरी गुप्ते यांनीहि सामील व्हावें, म्हणून नानांनी आपले जंग जंग पछाडले.
परंतु सखाराम हरीनें नानाला या प्रकरणांत जें सडेतोड उत्तर दिल तें कायस्थ प्रभूच्या इतिहासप्रसिद्ध स्वामीनिष्ठेला अधिकच उजाळा देण्यासारखे होतें हें उत्तर ग्रँट डफच्या शब्दांनीच आम्ही येथें देतों :- It Was agreed that a new ministry should be formed..........and Sakharam Hari nobly declared that nothing should ever induce him to abjure the cause of a generous master who had been his protector from youth to manhood, that Raghunathrao was a soldier, and Nana cunning cowardly courteer." Vol II P. 250 जो पक्ष एकवेळ स्वीकारला त्याचा त्याग करणे है कुलीनास उचित नाही. हे उद्गार सत्ताधाऱ्याच्या तोंडावर निभाया छातीने काढणाऱ्या सखाराम हरीला आणि त्याच्या ज्ञातीला राजवाडे खुनासारख्या विळस आणणाऱ्या आरोग्यांच्या मालिकेत तेव्हा त्यांच्या उलट्या काळजाची तारीफ करावी तेवढी थोडीच कायस्थ प्रभूंचा राजकीय इतिहास आणि चिटणीशी दिवाणगिरीच्या जागांवरील त्यांच्या इमानी कर्तबगारीचा महिमा शिवकालापूर्वीपासून तो आजदीनतागायत सर माधवराव चौबळ, सर रघुनाथराव सबनीस आणि सर नामदार चिणविसापर्यंत अव्याहत वाखाणला गेलेला आहे. परंतु महाराष्ट्रीयांना ज्ञात अशा शिवकालीन बाळप्रभू चिटणिसापासून जरी इतिहास पाहिला तरी देवांपासून तो आजच्या विद्यमान दिवाणबहादुर समर्थांपर्यंत एखाद्या कायस्थाने स्वामिद्रोह, खून किंवा राज्यापहार केल्याचे उदाहरण घडल्याचे आमच्या ऐकिवात नाही किंवा तसा कागदोपत्री पुरावाहि नाही उलट का. प्रभूच्या नेकीबद्दल आणि इमानाबद्दल श्रीशिवछत्रपतीचा जो अभिप्राय प्रसिद्ध आहे. तोच अभिप्राय सांप्रतच्या ब्रिटिश रियासतीतही कायमच असे असताना भा.इ.सं.मंडळाने राजवाड्यांचे हस्ते या समाजाला
निमकहराम, खूनी आणि स्वराज्यद्रोही
बनविण्याचे दुष्कृत्य करावे हें किती लांछनास्पद आहे. याचा सुज्ञानीच विचार करावा. `कायस्थांच्या वेदाधिकाराला विरोध केल्यामुळे नारायणराव पेशवा मारला गेला आणि पुढें मराठी राज्यांत २५ वर्षे यादवी माजली. हाच जर राजवाडयांच्या दीर्घ समजुती घा सिद्धांत असेल आणि स्वराज्य जाण्याला याच लोकांचे तंटे कारणीभूत झाले हा त्याचा निष्कर्ष असेल, तर मराठी राज्यात आणि खुद पेशवाईत कायस्थाखेरीज इतर सारे भ्याड आणि नामर्द होते हें तरी राजवाडे कबूल करायला तयार आहेत काय? आणि कायस्थ प्रभू जर इतके शिरजोर झाले होते तर पुढचे तीन पेशवे कोणत्या सबळ पुण्याईच्या जोरावर तगले?
टणत्काराचे परीक्षण करताना रा.ब. पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी एफ. आर. जी. ए. जे. पी. या ज्ञानवृद्ध व पयोवृद्ध इतिहास संशोधक गृहस्थांनी या मुद्यावर नवयुग फेब्रुवारी १९१९ च्या अंकात केलेले विवेचन मुद्दाम येथे उदधृत केले आहे.
श्री राजवाडयांच्या वरील विधानाच्या सत्यासत्यतेचा इतिहासदृष्ट्या आपण विचार करू. ह्यसंबंध प्रस्तुत लेखकास अधिकारयुक्त वाणीने बोलता येण्यासारखे आहे. कारण सुमारे पस्तीस वर्षामागे म्हणजे ज्यावेळी श्री राजवाडे हे कॉलेजांत इतिहासांचे अध्ययन करीत असतील किंवाइतिहास-संशोधनाच्या कार्याचा ओनामा शिकत असतील अशा वेळीं प्रस्तुत लेखकाने सर जॉर्ज फारेस्ट ह्यांच्या सहकारितेने मुंबई सरकारच्या दप्तरांतील मराठयांच्या इतिहासाच्या साधनांच्या प्रकाशनार्थ कित्येक वर्षे संशोधनाचे कार्य केले आहे. हे काम करीतअसताना आम्हांला सरकारच्या `सीक्रेट आणि पोलिटिकल खात्यांच्या जुन्या दप्तरात मराठ्यांच्या इतिहासावर नवीन प्रकाश पाडणारी बरीच माहिती उपलब्ध झाली. त्यापैकी काही महत्त्वाचा भाग Selections from State Papers, Mahratta Series नांवाच्या पुस्तकति प्रसिद्ध झाला आहे. त्यांत मुंबई सरकारनने वॉरन हेस्टिंग्स ह्यांच्या माहितीकरीता पुण्यातील इंग्रज वकीलांकडून लिहविलेला मराठी राज्याच्या स्थापनेपासून तो सन १७७५ पर्यंतचा मराठी राज्यव्यवस्थेचा साद्यंत वृत्तात प्रसिद्ध केला आहे. ह्या वृत्तांताच्या सूक्ष्म निरीक्षणानें असे सिद्ध होते की, नारायणरावाच्या वधास नारायणरावाची आई गोपिकाबाई व नारायणराव ह्यांचे दुर्वर्तन व कृष्णकारस्थानेच बहुतांशी कारणीभूत झाली.
थोरल्या बाजीरावाप्रमाणेच त्याचे नातू थोरले माधवराव राजनीतिविशारद व दूरदर्शी होते. राघोबादादाच्या शौर्याची व उपयुक्ततेची त्यास जाणीव होती आणि म्हणून दादाची राज्यकारभारात ते नेहमी सल्ला घेत असत आणि मरणसमयी गोपिकाबाईच्या तंत्राने न वागता दादांचे ऐकत जावे असा उपदेश नारायणरावास त्यांनी केला होता. नारायणरावाची आई गोपिकाबाई ही मोठी कारस्थानी व दुराचरणी होती. तिचे वर्तन पेशव्यांच्या कुळास काळिमा आणणारे आहे असे राघोबास वाटत असे. अशी वस्तुस्थिती असल्यामुळे गोपिकाबाईचा राघोबा व त्यांचे मंत्री ह्यांजवर मोठाच कटाक्ष होता हे उघड आहे. म्हणून दादासाहेब व त्यांचे दिवाण ह्यांचा सूड कसा घ्यावा ह्या विचारांत ती निमग्न असे. इंग्रजांचा पुण्यातील वकील विल्यम टेलर आपल्या रिपोर्टात म्हणतो, की गोपिकाबाई व नारायणराव ह्यांनी गुप्त खलबत करून दादा आणि सखाराम बापू ह्यांचा खून करण्याची योजना तयार केली होती. पण सुदैवाने मुधोजी भोसल्याने ह्या कारस्थानाची खबर सखाराम बापू व दादा ह्यांस वेळीच दिल्यामुळे गोपिकाबाईचा दुष्ट हेतु सिद्धीस गेला नाही. हें कारस्थान उघडकीस आल्यामुळे पुण्यास बरीच खळबळ उडाली दादा व नारायणराव तसेंच गोपिकाबाई आणि आनंदीबाई ह्यांच्यातील भांडण विकोपास गेलें आणि त्यांचे पर्यवसान नारायणरावाच्या वधांत झालें. ह्यासंबंधाने पुण्यातील इंग्रज सरकारच्या वकीलाचे म्हणणे पुढे दिल्याप्रमाणे आहे :
"It is said, by means of Mudaji Bhonsla the divan Sakharam received information of an intention to assasinate him and Raghoba, at the instiga tion of Gopikabai. Certain it is that this woman was well known to have been constantly advising her son to deprive him of the divanship which was the first step to the loss of riches and perhaps of life. From this instant Sakharam and his party set about concerting the means of deposing Narayanrao, relieving Raghoba, and placing him in the Peshwaship. Chiefly by means of the intervention of the Divan, Mahomed Essuf and Sumersing, two subhedars, were won over to excute the deed. On the 18th August 1773 at two in the afternoon they led their party of 500 men to the Darbar under pretence of being mustered, they forced the gates and put the guards to the sword-Narayenrao apprehensive of their design ran to his uncle Raghoba begging to take the Government but spare his life. Raghoba, it seems, wished to save him, as nothing more than his imprisonment was ever meant, but owing to the resentment of a slave of the family whom Narayenrao had caused to be publicly whipped, his death was determined upon. The assasins threatened instantly to destroy both, if he did not loose his nephew; he then thrust him from him and the young man soon expired at his feet.”
वरील उताऱ्यावरून असे दिसून येते की नारायणरावाचा वध करावा असा दादा व सखाराम बापू ह्यांचा विचार नसून नारायणरावास धरून पदच्यूत करावे असा त्यांचा उद्देश होता. नारायणरावाने आपल्या एका नोकरास भररस्त्यांत चाबकाने मारले होते. हा अपमानाचा सूड उगवण्यासाठी ‘नारायणरावास जीवे मारीन’ अशी त्याने प्रतिज्ञा केली होती आणि ती प्रतिज्ञा नारायणरावाचा खून करून त्याने शेवटास नेली. ह्यावरून नारायणरावाचा खून कायस्थ प्रभूच्या चिथावणीवरून झाला हा आरोप निराधार ठरतो."
( नवयुग २३७-२३८.)
त्याचप्रमाणे श्रीयुत माधवराव लेले यांचे खालील विचारहि मननीय आहेत.
नारायणराव पेशव्यांच्या खुनांत कायस्थ प्रभूचे अंग होते, हेंही विधान खरें मानता येण्याजोगें नाहीं. या तरुणबाड शिराळशेटी पेशव्याच्या संबंधाने अलीकडे बरेच वर्षांपूर्वीपर्यंत त्याच्या भयंकर व आकस्मिक खुनामुळे साधारणपणे महाराष्ट्रीयांच्या मनांत एक तऱ्हेची सहानुभूति व अनुकंपा वसत होती व तसे असणे लॉवर उपलब्ध असलेल्या हकीकतीवरून व तत्संबंधी करुणरसपूर्ण जुन्या व नव्या नाटकप्रयोग प्रेक्षणावरून विशेष गैर होते असे नाही. पण त्याच्या कारकीर्दीच्या व वर्तनाच्या संबंधानें अलीकडे उपलब्ध व प्रसिद्ध झालेल्या ऐतिहासिक माहितीवरून पाहता नारायणराव पेशवे ही एक संभाजी महाराजांचीच पुनरावृत्ति होती असे दिसते. त्याचा ज्या तऱ्हेने वध झाला ती तऱ्हा ग्राह्य असली तरी राघोबादादा व आनंदीबाई यांना त्याचा खून करविण्यावाचून गत्यंतर नव्हतें, असेंच म्हणावे लागते. त्याचें खाजगी वर्तन अनीतीचे व अन्यायाचे असून, सार्वजनिक व दरबारी वर्तनही गर्विष्ठ, उर्मट व उद्दामपणाचे होते. त्याचमुळेच तो अप्रिय झालेला होता. त्याच्या खुनाच्या दिवशी नाना फडणीस नव्हते हे खरे असले, तर त्यावरून, एक तर त्यावेळी त्यांचें दरबारात तितकें वजन नव्हतें आणि त्यांची कर्तृत्वशक्ति विशेष उदयास आलेली नव्हती असें, किंवा त्यांच्याकडून या प्रसंगी चुकून किंवा बुद्धचा उपेक्षा करण्यात आली. असेंच म्हणावें लागतें. सखाराम हरी गुप्ते यांची या खुनाच्या काम राघोबादादाला सल्ला असावा. या म्हणण्याला कांहीं आधार नाहीं, ही गोष्ट घडण्यापूर्वी त्यांना ती माहीत होती, असें म्हणण्याला सुद्धां अडचणच आहे. निदान तसा संशय बारभाईंना त्यावेळी आल्याचे अपलब्ध साधनांवरून दिसत नाहीं. प्रभु मंडळींत तेच त्या समयास विशेष प्रसिद्ध होते. या खुनाच्या संबंधात कोणाही कायस्थ प्रभूंवर त्या वेळच्या कर्त्या मुत्सद्दी मंडळींनी आरोप केल्याचें किंवा त्यास शिक्षा केल्याचें प्रसिद्ध नाहीं. अशा स्थितीत यासंबंधानें कायस्थ प्रभूंवर आरोप करणे अन्यायाचे आहे.
नारायणरावाचा खून झाला त्याचें बीज वास्तविकपणे नानासाहेब पेशव्यांच्या अकालिक भरमानंतर राघोबादादाला पेशवाईन मिळतो पोरवयाच्या माधवरावाला, तो नानासाहेबांचा उरलेला वडील पुत्र म्हणून मिळण्याविषयीं खटपट झाली तेव्हांच पेरलें गेलें. पेशवाई ही वंशपरंपरेची खासगी मिळकत समजली जाऊन हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे व कुलपरंपरागत पद्धतीप्रमाणे ती वडील पुत्राला मिळालीच पाहिजे असे समजण्यांत आले, ही मोठी चूक झाली. यावेळी राघोबादादा चांगला तरवारबहादर तसाच बऱ्याच योग्यतेचा लेखणीबहाद्दरही होता. त्याला पेशवाई मिळती तर बहुधा त्यानें पुनः आपला विशेष आवडता तरवारबहाद्दरपणा पतकरून राज्यव्यवस्थेचे काम इतर योग्य कामगारांकडे सोपून दिले असते आणि दोन्ही कामें सुयंत्र चालतीं, माधवराव मोठे झाल्यावर त्यांचे योग्य नायब व हस्तक बाजीरावाचे चिमाजी आप्पासारखे बनते आणि त्यांना क्षयानें मरण्याची पाळी न येती. तसेंच राघोबादादालाही दुसरे लग्न करून आनंदीबाईसारख्या अप्सरेच्या पाशांत सांपडून बाजीराव सारखें नवरत्न पैदा करण्याचा प्रसंगच न येता, त्याच्या पश्चात् विशेष कर्तृत्ववान व अनुभविक झालेल्या माधवरावाला अधिकच योग्यरीतीने पेशवाई करून नांव मिळविता आले असतें. पण अमुक झालें असतें तर तमुक झाले असते, असे म्हणणे व्यर्थ आहे.
भगवद्गीतेंत म्हटल्याप्रमाणे “देव वात्र पंचमं” हेच आपल्याकडे वेळोवेळी निदर्शनास येत गेलें व येत आहे. नारायणराव पेशव्यानें पेशवाईची वस्त्रे मिळविण्याच्या वेळी केलेल्या निर्मर्याद व गां वर्तनायें उपलब्ध वर्णन खरे असले तर याच वेळी एकाद्या अस्सल पूर्वपरंपरागत राजनिष्ठ प्रभूनें किंवा मराठयाने नारायणरावाला छाटून टाकलें असतें तरी त्यांत कांहीं वावगे होते ना. पण अशा वेळी सुद्धां कायस्थ प्रभू निमकहराम बनल्याचे दिसून येत नाहीं."
विविध ज्ञानविस्तार एप्रिल १९१९.
राजवाड्यांचा कायस्थ प्रभूंवरचा तिसरा आक्षेप असा आहे
`सातारच्या महाराजांच्या वतीनें दुसऱ्या बाजीरावाच्या विरुद्ध चांद्रसेनीयांनी इंग्रजांशी खटपटी केलेल्या महशूर आहेत." (पृ. ३८ कलम १३). हे विधान पाहिलें म्हणजे या कायस्थांना कोणत्या वैलात घालून कोणत्या वैलात काढू असे राजवाड्यांना झालेसे दिसते. चित्पावन नोकरशाहीच्या शेवटच्या उलट्या अंबारीच्या या दिग्विजयी इंद्राविरूद्ध इतर कोणी खटपटी केल्याच नाहीत की काय? मग चांद्रसेनीयांनाच तेवढे पुढे को ढकलण्यात येत आहे? रावबाजीचे असे कोणते सदगुण होते की त्याचे तळपट उडालेले पाहून, चांद्रसेनीयांच्या महशूर खटपटी राजवाड्यांच्या डोक्यात खुपू लागाच्या? छत्रपति प्रतापसिंहाची पेशव्याच्या तुरुंगवासांतून मुक्तता करण्यासाठी केलेल्या खटपटी मात्र राजवाडयांना दिसल्या आणि त्या त्यांच्या लाडक्या रावबाजीच्या विरुद्ध म्हणून तर अधिकच महशूर भासल्या आश्रित लोकांनी चार चार पांच पांच लग्ने करून घरी एक बायको ठेवावी आणि सरकारवाड्यात बाकीच्या बायका पाठवाव्या असल्या दिव्य राजनीतीचे पुरस्कर्ते रावबाजी जेव्हां गर्भात होते, तेव्हापासून त्यांच्या विरुद्ध कारस्थाने करणारे आणि त्याला, त्याच्या बापाला किंवा त्याच्या औरस संततीला चुकूनसुद्धां नमस्कार करावयाचा नाही, म्हणून ओंकारेश्वरावर नारायणराव पेशव्याच्या चितेसमक्ष शपथा वाहणारे नाना फडणीस काही चांद्रसेनीय नव्हते ना? राघोबादादावर खवळून जाऊन रावबाजीचा स्पर्श पेशव्याच्या गादीला न होऊ देण्याची शिकस्त करणाऱ्या बारभाईच्या खेतीत कितीसे चांद्रसेनीय सामील होते? ज्याच्या नांवानें जन्मदारभ्य हातबोटे चोळली त्याच रावबाजीला नानाने हात धरून पेशवाईच्या गादीवर बसविणें आणि आपण स्वतः त्याच राघोबाच्या कारट्या (सवाई माधवराव यानी शनिवारचे वाक्यात उडी टाकल्यावर ते मरण पावले. नंतर नाना फडणदिनी असा विचार केला की. दादासाहेब याचे मुलास पुण्याचे गादीवर आणले तर सर्वांस (?) अनिष्ट आहे. कारण ते सर्व राज्य याजकरिता दुसरा कोणी तरी यजमान बसवावा हे मनात आणून व राज्याचा नाश होऊ नये याकरिता बाजीरावाची पत्रिका करवून व राज्ययोग नाही वगैरे सबबी लाऊन ती प्रसिद्ध केली" - लो. हि. वा. भाग १, पृ. ४८-४९.) पुढे जी सरकार म्हणून हात जोडून उभे राहणे, या राजकारणी पागोट्याच्या फडणीशी फिरवाफिरवीला स्वराज्यासाठी स्वार्थत्याग समजणारे फक्त आंधळे नानाभक्त किंवा राजकारणाची चिपाडे चोखून मुत्सद्दीपणाची घमेंड मारणारे वावदूक पुणेरी दे. भ. याशिवाय दुसरे कोणी सापडतील की नाहीं याची शंकाच आहे.(The Maratha chiefs in general are much disgusted with Nana Fadnavis, and jealous of his ambitious view which apparently tend to fixing himself at the held of that Government." Forrest`s Selections, Vol. I, Part II P. 301. )
आत्मवर्चस्वासाठी घटकोघटकी धोरणांचे पागोटे फिरविणारा नाना स्वराज्यभक्त दिसावा आणि चांद्रसेनीय एकटेच काय ते स्वराज्यद्रोही दिसावे, यांत आम्हांला मुळींच आश्चर्य वाटत नाही. कोणती ऐतिहासिक व्यक्ति श्रेष्ठ, राजमान्य किंवालोकमान्य, हे ठरविण्याचा मक्ता आमच्या पुणेकर चित्पावन देशबंधूनी घेतलाच आहे, तेव्हा त्यांना सातारकर महाराजांच्या वतीने रावबाजीच्याविरुद्ध खटपटी करणारे चांद्रसेनीयच कायते दिसावे आणि कुप्रसिद्ध चिंतामणराव पटवर्धन शतकृत्य करणाऱ्या नरपुंगवाचे मुकुटशिरोमणि भासावे, यात काय नवल? ज्याचे अन्न खावे त्याच्याकरिता मराये या जन्मसिद्ध प्रवृत्तीमुळे सातारकर छत्रपतीच्या तक्ताचा अभिमान धरून, तत्कालीन राजकारणाच्या रामरगाड्याप्रमा चां.का.प्रभूनी रावबाजीच्या पाजी राजनीतीला शह देण्यासाठी आणि छत्रपतीच्या तक्ताच्या चिरस्थाइत्यासाठी जर काही खटपटी केल्या असतील, तर त्याबद्दल राजवाडे प्रभृति मत्सरी संशोधकाव्यतिरिक्त कोणीहि त्यांना जबाबदार धरू शकणार नाही परंतु जेथे राजवाडे
कायस्थ प्रभूंवर स्वराज्यनाशाचे खापर
फोडण्यास सिद्ध झाले आहेत. तेथे त्यांनी रावबाजीविरुद्ध केलेल्या खटपटीच्या पापाचे खरेखोटे माप त्याच्या एकट्याच्या पदरात न घालावे तर काय करावे? पुण्याच्या सुप्रसिद्ध प्राचीन साडेतीन शहाण्यांच्या ज्या अर्वाचीन अभिमानी दीडशहाण्याना अहिल्याबाईने दानधर्म करून पेशवाई बुडविल्याचे स्पष्टस्पष्ट दिसते आणि सामतचा मुसलमान समाज दंगेधोपे करणारा, सांसर्गजन्य रोगांनी लिबिडलेला कर्तव्यशून्य आणि इतर सुधारलेल्या, शास्त्रसंपन्न व शुचिर्भूत देशाची गुलामगिरी करण्यापलीकडे येणाऱ्या हजार बाराशे वर्षे गत्यंतर नसलेला (पहा मा. ई. स. म. चतुर्थ अहवाल पृ. १२) असा नीचतर पदवीस पोहोचलेला दिसतो. त्याच संशोधकांनी चा. का प्रभूवर घाणेरडे आरोप करण्यात प्रत्यक्ष आपल्या सदसद्विवेक बुद्धीचाहि खून करण्यास मार्गे पुढे पाहिले नाही, तर आश्चर्य नव्हे बरे, त्यातूनहि रावबाजीच्या विरुद्ध चां. का. प्रभूनी खटपटी केल्या असे राजवाड्यांच्या महशूर समजुतीप्रमाणे गृहीत धरलें, तरी सांप्रतच्या कारस्थानातसुद्धा अभिमान बाळगायला बरीच जागा आहे.
शरीराचा नासकाकुजका अवयव कापून टाकणे हे ज्याप्रमाणे केव्हाही श्रेयस्कर असते, त्याप्रमाणे ज्या उदात्त कल्पनेवर श्रीशिवछत्रपतीनी मराठी राज्याची स्थापना केली व ज्याकरिता चा. का. प्रभूसमाजानें आपल्या अनेक नरनारीच्या प्राणांच्या आहुती दिल्या. त्याच कल्पनेला जेव्हा स्वार्थसाधु आणि कृतघ्न अशा चित्पावन नौकरशाहीची कीड लागली. तेव्हा तो नोकरशाहीचा सडका भाग छाटून टाकण्याच्या उद्देशाला हातभार लावणे तत्कालीन कायस्थांना श्रेयस्कर वाटले असल्यास काही नवल नाहीं.
आम्ही तर आज असेहि म्हणतों की पेशव्यांनी छत्रपतीला कैदेत टाकताच, एखाद्या कायस्थाने रावबाजीला भर बुधवारात छाटून टाकला असता, तर कदाचित् स्वराज्याची मान इतक्या लवकर फासावर चढली नसती! तथापि इतिहास पाहिला तर स्वराज्यनाशाच्या बाबतीत खुद चित्पावन नोकरशाही आणि तिच्या नावाचा गोंधळ घालणारे चित्पावन मुल्ये यांना जितका जाब देणे भाग पडेल, तितका चां. का. प्रभूना मात्र खास नव्हे. खुद्द ब्रिटीश सरकारच्या संशोधक खात्याचा शेरा पहा. Even during the rule of the Peshavas, persons of this community (C. K. Prabhu) like the warlike brothers Sakharam Hari and Baburao Hari Gupte, of whose unswerving loyalty to their master, Nana Fadanavis was extermely jealous, and Nilkanthrao Page Played a conspicuous part in the maintenance of Maratha Rule.(Monograph No. 4 p. 9) या शेन्यानंतर किक इतिहासप्रसिद्ध कायस्थ "This carte has maintained its
थोडक्यात माहिती देऊन समारोप केला आहे की, character for loyalty and trustworthiness to the present day. Members of it hold places of trust both in Native states and under the British Govern ment, to whom they have always exhibited conspicuous loyalty आश्रयदात्या तक्ताधिपति राजाशी इमानी है जर पुण्याच्या विश्वामित्र संशोधन दृष्टीला आणि सरडेवजा राजकारणाला पातक वाटत असेल, तर त्या पातका भागीदार व्हायला (चा. का. प्रभू केव्हाही तयार आहेत. ज्याला एकदा इमान दिले. त्याच्या अखेरपर्यंत एकनिष्ठेनेंच वागणे, हें एकच तत्व कायस्वप्रभूंच्या ब्रीदाची साक्ष पटविण्यास पुरेसे आहे.) आणि त्यांचा सारा इतिहास या एकाध तत्त्वाने जणूकाय रंगून निघालेला आहे, असे म्हणण्यात मुळीच अतिशयोक्ति होणार नाही. कायस्थ प्रभूशी चित्पावन समाजाने पेशव्याच्या भरभराटीच्या अमदानीत काय थोडे हाडवैर गाजवून घेतले? (त्या इतिहासप्रसिद्ध पशुक्त वर्तनाची पुनरावृत्ति ईश्वर करो आणि आमच्या कट्टया दुष्मनावरहि न होवो ) परंतु इमान दिलेल्या चित्पावनसुद्धा कायस्थ प्रभूंनी आपल्या निष्ठेत अणुरेणू कमी केला नाही. सरदार सखाराम हरी गुप्ते यांनी चित्पावन पेशवे राघोबादादाची नोकरी बजाविण्यात वेळोवेळी किती स्वार्थत्याग केला (आणि अखेरीस आत्मयज्ञहि केला ) आणि विरुद्धपक्ष प्रबलतम असतांहि फार काय लाचलुचपतीचाहि जोर भयंकर असतांना त्यांनी एकनिष्ठेची केवढी अपूर्व चिकाटी दाखविली याचा जर आमच्या आधुनिक चित्पावन देशबंधूनी किंचित निःपक्षपात बुद्धीने विचार केला, तर वेळास येथे नाना फडणीसाचा (नानाने सखाराम हरीला पकडण्याकरिता जी नीच कारस्थाने लढविली, त्यांच्याहि वर अमानुषपणाचा कळस करणारा त्याचा तुरुंगात झालेला छळ आणि पतीचे शेवटचे दर्शन घेण्याकरिता कावऱ्याबावऱ्या झालेल्या त्याच्या पत्नीपासून १५,००० रुपये रोख व कित्येक हजारांच्या दागदागिन्यांचा लांच हबकून शेवटी तिची जाणूनबुजून केलेली प्राणघातक निराशा, या नानाच्या पशुतुल्य वर्तनाचा इतिहास वाचला म्हणचे अंगावर काटा न उठणारा मनुष्य खात्रीने मनुष्यच नसला पाहिजे.)
वार्षिकोत्सव करण्याची त्यांना खचित लाज वाटेल. राघोबादादाने इंग्रज कुंफणीची कास धरताच त्याचे सर्व इमानी आणि एकनिष्ठ सेवक सहाजीकच त्याच्याबरोबर तिकडे वळले, यांत विशेष काही नाही, पण तेवढ्यावरून रावबाजीविरुद्ध खटपटीचे खापर कायस्थ प्रभुच्या माथी येऊन कसे फुटते, हे मात्र आम्हांला कळत नाही, स्वतःच्या माथी येऊन भिडलेले स्वराज्यनाशाचे पाप येन केन प्रकारेण कायस्थांच्या माथी मारण्याचा उपद्व्याप करणाऱ्या चित्पावन इतिहास संशोधकांनी रावबाजीच्या धामधुमीत तत्कालीन चित्पावन सरदारांनी काय काय कारस्थानें लढविली आणि पेशवाई गेली तर जावो पण माझी सांगली चांगली राहो म्हणून स्वतः या तळीराम गार करण्याकरिता काय काय उलाढाल्या केल्या, याचा इतिहास डोळे असल्यास अवश्य पहावा.
सरदार सखाराम हरीचे पुत्र आनंदराव हे दुसऱ्या बाजीरावाच्या पदरी होते. रावबाजीने मराठी राज्यांचे उदक इंग्रज कुंफणी बहादुरांच्या हातावर सोडल्यानंतर या आनंदरावाच्या एकनिष्ठेने आपल्या तेजस्वी पित्याच्याहि एकनिष्ठेवर ताण केली. बाजीरावाचा आश्रय नष्ट झाला म्हणून साताऱ्याच्या महाराजांनी आनंदरावाचा बंदोबस्त करून देण्याचे कबूल करून भेटून जावे म्हणून निकडीचे निरोप पाठविले असता, आनंदरावाने उत्तर पाठविलें की, "पेशवाई गेल्यापासून मनात असा संकल्प केला आहे की, आतां या उपरांत कामकाज करणे नाहीं. हे एकनिष्ठेचे बाणेदार उत्तर आणि वर्तन पहा आणि चित्पावन कुलदीपक सदाशिवराव भाऊने स्वतः च्या भावांवर रुसून जाऊन कोल्हापुरकरांची पेशवाई पत्करल्याचा प्रसंग पहा! कायस्थ प्रभूनी आजपर्यंत आपल्या बऱ्यावाईट धन्याशी जे एकनिष्ठेचे इमान दाखविले तसले एकतरी उदाहरण चित्पावनांच्या जातभाई पैकी (ज्या धनाजी जाधवाने बाळाजी विश्वनाथाला आपत्कालीं आश्रय दिला, त्याच जाधवावर क्षुल्लक शिकारीच कारणावरून बाळाजी विश्वनाथ कसा उलटला याचा इतिहास पाहिला म्हणजे कायस्थं न हि विश्वसेत्` म्हणणा-या शरमच वाटली पाहिजे.) कोणी घालून दिले असल्यास ते त्यांनी सप्रमाण जाहीर करावे पेशवाईच्या अखेरीस कोकणातील सुवर्णदुर्ग गडावरील मराठेशाहीचे अन्न खाणाऱ्या गडकरी प्रधान (सुप्रसिद्ध मराठी कवि कै. बजाबा रामचंद्र प्रधान यांचे आजे व चुलत आजे.) बंधुत्रयाचे आणखी एक उदाहरण घ्या. आसपासचे किल्ले इंग्रजानी काबीज केल्यावर त्यांचा हल्ला सुवर्णदुर्गावरहि आला. पेशवाईत सारी बेबदशाही माजली असता आणि सातारकर धनी त्यामुळे निर्माल्यवत् झाले असतांहि केवळ मराठेशाहीचा अभिमान धरून प्रधानबंधूनी इंग्रजाशी प्रतिकाराची टकर मारली.
पुढे इंग्रजानी किल्ला सर करून प्रधानबंधूना कैदेत टाकले ही गोष्ट निराळी. पेशवाई घशात उतरल्यावर ती नीट पचनी पडावी म्हणून कुंफणीने पुढे जे सामोपचाराचे धोरण पत्करले त्या वेळी प्रधानबंधूंना बंधमुक्त करून त्यांच्या स्वामीनिष्ठेचा आणि शौर्याचा इंग्रजांनी मोठा गौरव केला आणि इंग्रज रियासतीत मोठ्या नोकऱ्या देऊ केल्या. परंतु आम्ही पिढीजाद मराठेशाहीचे अन्न खाल्ले. टोपकरांची नोकरी कधीहि करणार नाही असे सडेतोड उत्तर देऊन, त्यानी आपले शेष आयुष्य अत्यंत विपदावस्थेत कंठून परलोकचा रस्ता सुधारला उलटपक्षी पेशवाईतल्या चित्पावन सरदारांकडे पहा.
रावबाजी आणि इंग्रज यांच्यात जेव्हा चुरशीचे सामने होऊ लागले आणि पेशव्यांची गादी फार वेळ टिकत नाही असे जेव्हा या घाटावरील जवानमदं (?) ब्राह्मण भाई `ना स्पष्ट दिसू लागले, तेव्हा ज्याचे कर्म त्याच्याबरोबर असे मानून, ते आपापल्या सरंजामी संस्थानांची व्यवस्था लावण्यात कसे चूर झाले आणि स्वामिसेवेला कसे चोर झाले, ह्याचा इतिहास राजवाडे कंपूला काय माहीत नाही? परंतु नृतनापित न्यायाचा नेहमी अवलंब करणाऱ्या आणि त्यावेळी प्रसंगानुरोधाने चित्पावन सरदार तसे वागले म्हणून तरी महाराष्ट्रांत मराठ्याची (?) (चित्पावनांची) काही संस्थाने राहिली म्हणून मुक्त कंठाने स्तुतिरव गाणाऱ्या संशोधकांनी श्री. केळकरांच्या ‘मराठे आणि इंग्रज नामक’ शतसांवत्सरिक श्राद्धाच्या तर्पणाकडे दृष्टी वळवावी. अशी शिफारस आहे. चां. का. प्रभू समाजावर पेशवाईच्या नाशाचा आणि पर्यायाने स्वराज्यनाशाचा आरोप करणाऱ्या पुणेरी संशोधक टोळीला आमचा अत्यंत नम्रतेचा सवाल आहे की पुण्याच्या शनवार वाड्यावर इंग्रजांचे निशाण फडकवणारा बाळाजीपंत नातू तर कायस्थ प्रभू नव्हता ना? ओव्हिन्स रेसिडंटाला छत्रपतीच्या नांवाची खोटीं शिक्का मोर्तबे तयार करून देणारा बाळकोबा ‘तात्या केळकर’ हा तरी चां. का. प्रभू नसावा असें वाटतें.
बाजीराव पेशव्याला इंग्रजानी पेनशनर बनवून, महाराष्ट्रांत नातूंच्या हस्ते इंग्रजी राज्याची कोणाशिला बसविल्यावर पुणे शहरात पेढे वाटण्यात आले आणि उत्सवाह करण्यात आले. सवाई माधवरावांच्या टोलेजंग विवाह समारंभात नाना फडणीसांनी सरदार पोतनिसांच्या हातांत जशी अत्तरदाणी गुलाबदाणी दिली होती. तशी नोकरशाहीच्या तळपटाच्या या दिवशी विंचुरकर, पटवर्धन, नातूने कोणकोणत्या कायस्थांच्या हातात यांची तबक दिली, त्यांची यादी राजवाडे अगर मा. इ. से. मंडळ प्रसिद्ध करतील तर बरे होईल रावबाजीच्या कारकिर्दीत जे जे (शिवाजीमहाराजांचे उदात्त राजधोरण जेव्हा पेशव्यांनी सोडिलें, व इंग्लिशासारख्या बलिष्ठ शत्रूबरोबर जीवनार्थ कलहाची वेळ आली. तेव्हांच पेशवाई ठार बुडणार अशी चिन्हे दिसू लागली.
“जस्टिस रानडे.( म. स. उ. पृ. २१७.) अत्याचार झाले. त्याचा उपलब्ध आणि प्रसिद्ध झालेला इतिहास वाचला. म्हणजे पुण्यातील सर्व जातीच्या रहिवाशांनी ब्राह्मणांनी सुद्धा पेढे का वाटले, याचा स्पष्ट उलगडा होती. शनवारवाडावर युनियन जॅकचा बावटा फडकावून आपल्या मूठभर घोडेस्वारांना घेऊन आलेले अलपिष्टन साहेब जेव्हा दिल्ली दरवाजासमोर खुर्ची टाकून बसले, तेव्हा तो राज्यक्रांतीचा देखावा पाहण्याकरिता पुण्यपतनस्थ लाखों तमासगीर त्याच्या सभोवती लांबलांबवर उभे राहिले होते परंतु एकाहि मायच्या पुताला त्याला असा प्रश्न विचारण्याचा धीर झाला नाही की, बाबा अलपिष्टणा! तू कोणाचा कोण? आणि येथे आमच्या घरी का?" त्यावेळी लोक काही निशस्त्र झाले नव्हते किंवा लढाईचा मगदूरहि आताप्रमाणे काही अस्तंगत झाला नव्हता. परंतु रावबाजीचा महिमाच असा काही होता की सदीच्या जोरावर त्यांच्या वाडवडिलांनी स्थापन केलेल्या पुण्याच्या एकमुखी नोकरशाहीची तिरडी निघताना त्यावेळी एकाहि महाराष्ट्रीयाच्या डोळ्याला पाणी आले नाही. चां. का. प्रभू तर बोलूनचालून सातारकर छत्रपतीचे कई दोस्त व चित्पावन नोकरशाहीच्या विरुद्ध, परंतु पेशवाईच्या विरुद्ध खुर चित्पावन सरदारानी इंग्रजांशी केलेल्या खटपटी जितक्या कागदोपत्री प्रसिद्ध आहेत तितक्या कायस्थानी केलेल्या मशहूर नाहीत, हे राजवाड्यांनी खूप ध्यानात ठेवावे सातारकर छत्रपतीबद्दलची स्वामिनिष्ठा कायस्थानी अगदी शेवटपर्यंत किती इमामाने बजावली याचे कायमचें स्मारक महाराष्ट्राच्या इतिहासांत केव्हाही अजरामरच राहील, इतके ते ठसठशीत आणि भरभक्कम आहे.
३ जून सन १९१८ या शतसांवत्सरिक श्राद्धाच्या तारखेचे महत्व जर काही असेल तर तें हेंच की शंभर वर्षांपूर्वी याच दिवशी मराठी राज्याच्या मालकाशी विरोध करून, सतत शंभर वर्ष एकमुखी अरेरावी गाजविणाऱ्या चित्पावन नोकरशाहीचा अंत झाला. आमचे आधुनिक उन्नत आणि निःपक्षपाती चित्पावन देशबंधु महाराष्ट्रांतील या मयत नोकरशाहीच्या इतिहासाचा जर सूक्ष्म दृष्टीने अभ्यास करतील, तर सध्याच्या राष्ट्रीय चळवळीत कोणकोणत्या पातकापासून आपण दूर राहिले पाहिजे, हे त्यांचे त्यांना स्पष्ट समजून येईल. श्रीयुत लेले या मुद्यावर लिहितांना म्हणतात की :--
"सातारच्या महाराजांच्या वतीने इंग्रजांशी दुसऱ्या बाजीरावाविरुद्ध खटपटी करणारे कायस्थ प्रभूष हेंही विधान खरे नाही. शाहूनंतरच्या सातारकर महाराजांशी विशेषतः रामराजानंतरच्या महाराजांशी पेशव्यांनी जे वर्तन केल्याचे मग ते स्वार्थ बुद्धीने असो, निरुपायानें असो किंवा मराठी साम्राज्य संवर्द्धन व संरक्षण या दृष्टीने असो- लेखी पुराव्यावरून उपलब्ध आहे, त्या मानानें पाहता त्यांच्या वतीनें कायस्थ प्रभूंनीच काय, पण कोणीही लहान थोर महाराष्ट्रीयन ज्या ज्या काही खटपटी केल्या असतील, त्यासंबंधाने मुळींच आक्षेप घेता येत नाही. शेवटच्या रावबाजीच्या कारकिर्दीत सर्वत्रच गडबड उडाली त्याच्या वर्तनामुळे सर्व सरदार बेदिल झाले रयत नागविली गेली. कोणी त्राता उरला नाही. ज्याने त्याने आपापल्या कायमीचा विचार होईल त्या रितीने करण्याचे आरंभिले. त्यांत इंग्रजांशी गुप्तपणे स्वतःच्या बंदोबस्तासाठी तजवीज करून ठेवण्याचा उपक्रम प्रथम पटवर्धनांनी केला. हा निमकहरामपणा नव्हे असे काही म्हणता येत नाही, तरी पण घरचा जाच दुस्सह होऊ लागला, "आई जेवू घालीना व बाप भीक मागू देईना”, अशी स्थिती झाली, म्हणजे अर्थातच मुलाला स्वतःच्या रक्षणार्थ परक्याचा आश्रय करावा लागतो हे कृत्य थोरपणाचे नसले तरी स्वसंरक्षणार्थ निरुपायाने केलेले असल्यामुळे तितकें दूषणीय म्हणता येत नाही. बाकी हरामखोरपणाचा धडा चित्पावनानीच घालून दिला, हे म्हणणे तत्त्वत: खरे आहे असेच म्हटले पाहिजे.
वि. ज्ञा. विस्तार, एप्रिल १९१९.
****
भाग ६
कायस्थ प्रभू समाजाची हकनाहक बदनामी करण्यासाठी राजवाडे व भारत इतिहास संशोधक मंडळ यानी जो गुप्त कट केला आणि कायस्थावर शेकडो घाणेरडे अपमानकारक आरोप केले. त्यापैकी ऐतिहासिक बाजूच्या तीन ठळक आक्षेपांना येथपर्यंत प्रत्युतयें दिली, आता शेवटचा आरोप मात्र बराच भयंकर असून, कायस्थामुळींच हिंदवी स्वराज्य ठार बुडालें हें जनजाहीर चौघडा वाजवून दाखविण्याचा जो मंडळाचा व राजवाड्यांचा मूळ हेतु त्यांतील काळाकुट्ट मत्सर आपणांस उघड करून दाखवावयाचा आहे. वरवर पाहता कोणालाहि असे दिसतें की, राजवाडे केवळ ऐतिहासिक साधनाची चिकित्सा करीत आहेत. परंतु त्यांच्या सर्व लेखाची रचना व हेतु ऐतिहासिक सत्याशी विसंगत असून, फक्त कायस्थ प्रभूविषयींचा त्यांच्या चित्पावनी हृदयातला तीव्र द्वेष ओकून टाकण्याचाच हा एक परशुरामी प्रयत्न आहे, हें आतापर्यंतच्या घेतलेल्या झाडझडतीवरून वाचकांना नीट पटले असेल. राजवाड्यांची किंवा त्यांच्या छायेतील संशोधक भिक्षुकांची एक खोडसाळ प्रवृत्ति लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यांना शहाजीचे गुण गाण्याची इच्छा असली की, मालोजी व शिवाजी यांना ते क्षुद्र लेखतात व शिवाजीला वर चढवायचे असले तर त्याच शहाजीला खुशाल खाली ओढतात. कायस्थ प्रभूंची पाठ थोपटून काही कावा लढवायचा असला की मराठ्यांची पाठ यथास्थित धोपटतात आणि मराठ्यांची मनें कायस्थांविरुद्ध भडकवून द्यायची असली की मराठ्यांना कुरवाळून कायस्थांना लाथाडण्यास त्यांना मुळीच वेळ लागत नाही. मराठ्यांच्या वेदोक्ताची किंवा क्षात्रोत्पत्तीची टर उडविण्यासाठी कायस्थांच्या धर्माधिकारांना मान्यता द्यायची आणि कायस्थांची बदनामी करतांना थेट मालोजी भोसल्याला अग्निहोत्री ब्राह्मण म्हणून ठरवायचे, हा असला
पाजीपणाचा डोंबारी खेळ
ही ब्राम्हण मंडळी आज गेली दोन अडीचशे वर्षे सारखी खेळत आहे. अस्सल पुराव्यांची मोठी मिजास मारणारी ही संशोधक डुकरे मग वाटेल त्या काल्पनिक विधानाच्या खातेयांत मनसोक्त बांगा आजूबाजूची सुद्धा लाज बाळगीत नाहीत कायस्थांच्या नाकाडावर सज्जर ठोकलेला राजवाड्यांच्या ४ थ्या मुद्याचा गुद्दा पहा :
"प्रतापसिंहाच्या कारकीर्दीत कायस्थानी वेदोक्त प्रकरण इतके वाढविले की खुद्द प्रतापसिंहाला व मराठ्यांना वेदोक्त संस्कारांचा अधिकार आहे की नाही यासंबंधाने वाद सुरू झाला. आतापर्यंत फक्त चांद्रसेनीय तेवढे वेदोक्तसंस्काराकरिता झगडत होते यापुढे या झगडात सातारचे मराठे अजाणपण चांद्रसेनीयांच्या खटपटीने गोविले गेले. वस्तुतः भोसले व इतर मराठे क्षत्रिय असल्यामुळे वेदोक्तसंस्काराधिकार त्यांना पूर्ण होता. परंतु गैरसमजुतीने व पक्षाभिमानाने त्यांना तो अधिकार नाही असे नाना सबबी काढून प्रतिपादिले जाऊ लागले.
म्हणजे राजवाडे म्हणतात की मराठ्यांच्या वेदोक्त संस्काराच्या अधिकाराबद्दल पूर्वी कधीच कोठे वाद नव्हता. ब्राह्मणांनी त्याबद्दल कधी ब्र सुद्धां तोडांतून काढला नाही किंवा त्यांना कधी वेदोक्त धर्माचाराचा विरोधहि केला नाही. मालोजीपासून तो थेट प्रतापसिंहापर्यंत राज्यांचे क्षत्रियत्व सोळा आणे मान्य करून सर्व ब्रह्मत्युत्पन्न वेदोनारायण त्याचे वेदोक्त कर्म बिनतक्रार कायावाचामनेंधने करीत होते. कोठे फट् नाही. कोठे खट नाही. रमण्यातल्या ब्राह्मण भोजनातील ढेकराप्रमाणे सर्व काही सुरळीत चाललें होतें पण या खटपट्टया कायस्थानी मध्ये बिब्बा घातला. कायस्थ जर पृथ्वीतलावर नसते, किंवाअसूनहि परमेश्वरावतार चित्पावन पेशवाईच्या वरवंट्याखाली सौंफची बियाण्यांसुद्धा नष्ट होते, तर प्रतापसिंहाचा किंवा मराठ्यांचा आणि वेदोनारायणांचा कोठे कधीहि झगडा येण्याचे कारणच नव्हते.
यावर एवढीच कोणी झाला तरी शंका काढणार की राजवाड्यांचा हा चित्पावनी सिद्धांत खरा मानला तर अलीकडची कोल्हापूरची वेदोक्त प्रकरणे इतकी चिडीला जाऊन तेथल्या राजोपाध्यांच्या वतनी जहागिरी जप्त का झाल्या? मराठ्यांना व कोल्हापूरच्या छत्रतींना शूद्र शूद्र म्हणून चिडविणारे व तंजावर केसचा निकाल ‘सर्व मराठे शूद्र आहेत’ असा लागल्यावर टिया बडविणारे लोक ब्राह्मण की मुसलमान? इतिहास पाहिला तर छत्रपतींच्या काय किंवा सरसकट मराठ्यांच्या गळ्यांत काय वेदोक्ताची घोरपड कायस्थ प्रभूंनी अडकविली नसून, ती कृतघ्न ब्राह्मण समाजानेच खुद शिवाजीपासून त्यांच्या गळ्यात अडकवून ठेविली होती. आणि ती काढण्याकरिता मात्र कायस्थ प्रभूनीच आपल्या रक्ताचे पाणी केले. शिवाय छत्रपतीच्या विरुद्ध वेदोक्ताचे बंड काही प्रतापसिंहाच्याच कारकीर्दीत उभारले गेलें नसून. (आर्य छत्रपतीला राज्याभिषेकच होऊ नये म्हणून ज्या द्वेष्ट्या व कृतघ्न ब्राह्मणांनी आपल्या शक्तियुक्तीची अगदी शिकस्त केली.) त्यांनीच ते प्रथम उभारल्याचे इतिहासांत नमूद आहे. श्रीशिवछत्रपतीच्या स्वराज्योपक्रमाचे आजकाल पोवाडे गाणारे आणि पत्रव्यवहारांतसुद्धा राज्याभिषेक शक (शिवाजीचा राज्याभिषेक शक १०४ वर्षे चालला. सन १७७७ त दुसरा शाहू गादीवर आला तेव्हा नाना फडणीस व सखाराम बापू यांनी हा शक कागदोपत्री वेद करण्याचा हुकूम काढला. (भारत इ. स. मे. अहवाल शके १८३५ पृ. ८७.) केवढी हो ही नामाची राजनिष्ठा?) लिहिणारे टापटिपीचे अभिमानी पुणेकर संशोधक जरा डोळे उघडून इतिहास पाहतील, तर ज्या शिवाजीची टिमकी पिटण्याची आपण आजकाल मोठी कसरत करून दाखवीत आहोत. त्याच शिवाजीला आपल्या वाडवडिलांनी वेदोक्ताच्या ढोंगाखाली कसे पंचांत आणले होते हें समजायला फारसे कठीण जाणार नाहीं. अर्थात् मराठ्यांना वेदोक्त संस्काराचा अधिकार आहे की नाही, या वादाचा निकाल शिवाजीच्या अभिमानी बाळप्रभु कायस्थानें प्रथम लावून घेतल्यावरच मग राज्याभिषेकाचा समारंभ पार पडलेला आहे, हे ऐतिहासिक सत्य मंडळाचा एकूण एक संशोधक वीर खर्ची पडला तरीहि उलथून पडणें शक्य नाही. शिवाजीच्या किंवा त्याच्या जातभाईंच्या वेदोक्त संस्काराचे पुनरुज्जीवन करण्याचा अग्रमान कायस्थ प्रभूंचा आहे.
उदेपुराहून वंशवृक्षाच्या प्रति आणविणें (पैठणाहून गागाभट्टाला स्वतः जाऊन मोठ्या शिकस्तीनें रायगडास आणणे आणि त्याच्या हातून दरोबस्त मराठ्यांना शूद्रत्वाच्या खोट्या आख्याइकांपासून मुक्त करणें ही इतिहासप्रसिद्ध कामगिरी बाळप्रभूनेच बजावली आहे. कायस्थ प्रभू आणि मराठे यांचा यानंतरचा परस्पर स्नेहसंबंध पाहिला तर असे दिसून येईल की, (छत्रपतीवर किंवा मराठ्यांवर ज्या ज्या वेळी भिक्षुकांकडून वेदोक्ताचा हल्ला चढविण्यांत आला, त्या त्या वेळी कायस्थ प्रभूनीच त्या हल्ल्यांना पुढे होऊन तोड दिले आहे.) ही गोष्ट आजदीनतागायतसुद्धा घडत असल्याचे दाखले पाहाला पुण्यापासून फार दूर जायला नको. प्रतापसिंहाला वेदोक्ताच्या खटपटीत कायस्थांनी गोंविले की निमकहराम चित्पावन चळवळ्यांनी मराठ्यांना वेदोक्ताच्या पंचात आणले. हे सांगायला राजवाडे नकोत, या बाबतीत इतिहास आरशांसारखा स्वच्छ आहे. ‘ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास’ आम्ही मंडळाला नजर केलाच आहे. छाती असेल तर त्यांनी तो खोटा ठरवून द्यावा.
छत्रपतीच्या वेदोक्त्ताकरिता, क्षत्रियत्वाच्या पुनरुज्जीवनाकरिता आणि तक्ताच्या चिरस्थाइत्वाकरिता चां. का. प्रभूनी केलेल्या स्वार्थत्यागाबद्दल आणि ऐतिहासिक कामगिरीबद्दल कृतघ्न असलेला एकादा मराठा किंवाशिवाजीचा अस्सल वंशज सांपडणे आजलाहि बरेंच मुष्किलीचें आहे. म्हणें चांद्रसेनियांच्या खटपटीनें या झगड्यांत सातारचे मराठे अजाणपणे गोविले गेले! सातारचे मराठे अजागळ आणि बेवकूब होते किंवा आहेत, अशी का राजवाड्यांची समजूत आहे? असेल तर, मराठे मूर्ख नसून, स्वतः राजवाडे मूर्खाग्रणी म्हटले पाहिजेत. कै. शाहू छत्रपतींनी ब्राह्मणांच्या निमकहरामीला व चित्पावनांच्या कारस्थानांना कंटाळून, अखिल ब्राह्मणेतरांकरिता व विशेषतः मराठ्यांकरितां धार्मिक स्वयंनिर्णयाची चळवळ सुरू केल्यास फार दिवस लोटले नाहीत. या चळवळीने मराठ्यांत धार्मिक स्वातंत्र्याचा झालेला अफाट फैलाव आणि कायस्थ प्रभूत अझुनहि भरपूर असलेली मिक्षकांची पायाचाही गुलामगिरी पाहिली की मराठ्यांवर केलेला अजाणतेपणाचा आणि चांद्रसेनियांच्या ओंझळीने पाणी पिण्याचा राजवाड्यांचा आरोप मराठे क्षुल्लक कानझाडीवरच विसरतील असे आम्हाला वाटत नाही अडचणीचा फायदा घेऊन कायस्थ प्रभूंनी मराठ्यांवर किंवा कोणावर कुरघोडीचा कधींच प्रयोग केलेला नाही.
प्रतापसिंहकालीन मराठ्यांवरील ग्रामण्यांत काशी कर्नाटकांतल्या वेदोनारायणांना वादांत जिंकून मराठ्यांचे क्षत्रियत्व सिद्ध करण्यात विजय मिळविणारा शास्त्री आबा पारसनीस हा कायस्थ प्रभू होता. परंतु एवढयामुळेच कायस्थ प्रभू मराठयांचे राजोपाडे बनले नाहीत किंवा छत्रपतीचे मांडलिक जहागीरदार झाले नाहींत. चित्पावनांनी निष्काम कर्माचा नुसता वाचाळपणाच करावा. कायस्थांचा सर्व इतिहास प्रत्यक्ष निष्काम कर्मी आहे. एवढाच काय तो फरक!
भोसले छत्रपतींना वेदोक्ताचा पूर्ण अधिकार होता, परंतु चांद्रसेनीयांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांचा गैरसमज केला, हे राजवाडयांचे विधान गृहीत धरले तरी प्रत्यक्ष पुरावा कसा पडतो तो पहा. शाहूनंतर १७४९ त रामराजा गादीवर बसून लगेच तुरुगांत पडला. छत्रपति कैदेत आणि पेशवे गणेशमहालाच्या सदरेत! बिचाऱ्या छत्रपतीला कोरडी भाकर मिळण्याची मारामार, त्याला इतर संस्कारांचा काय लाभ मिळाला असेल, तो राजवाड्यांनीच सांगितलेला बरा! पण शेवटी देवाने रामराजाची कहाणी ऐकली व सन १७०७ त त्याला अखेर मृत्यूसंस्काराचा लाभ झाला. रामराजानंतर शहाजी गादीवर बसला शहाजी क्षत्रिय, तेव्हां साहजीकच लग्नापूर्वी त्याची वेदोक्त मुंज व्हावयास पाहिजे होती. त्या वेळी नाना फडणिसांची अमदानी सुरू होती त्याने छत्रपतीच्या कैदखान्यावरील जेलर बाबूराव कृष्ण यांस लिहिलेल्या पत्रांत --
.....राजश्री स्वामी यांची मुंज वैशाख वद्य पंचमीस आठ घटकांचे मुहूर्तावर समारंभेकरून जाहली..... ... पुराणोक्त विधीने मुख्य जाहली येणेकरून बाईसाहेब आदीकरोन सर्वास संतोष वाटला. श्रीमंत महाराजाधी मुज्य वद्य पंचमीस पुराणोक्त
विधी करून बाईसाहेबास संतोष वाटून जाहाली. ही तुम्ही फारच गोष्ट उत्तम केली
हा मजकूर आहे. त्याचप्रमाणे इतिहास आणि ऐतिहासिक मासिकांतून प्रसिद्ध झालेल्या “पेशवाईची अखेर” पू. १४४ वर प्रतापसिंह छत्रपतीविषय साताऱ्याचे राजे राज्याभिषेक करावयाच्या पूर्वी मुंज करून मग राज्यभिषेक व्हावा अशी शिवाजी महाराजांची पासून चाल होती ती श्रीमंतानी या वेळेस मना करून "मुंज केल्याशिवाय राज्याभिषेक केला”. असा उल्लेख आहे. शहाजीच्या पुराणोक्त मुंजीत कोणकोण खटपट्ये कायस्थ होते? आणि शहाजीची व प्रतापसिंहाची धर्मसंस्काराच्या बाबतीत श्रीमंतांनी व नानांनी जी वरची बडदास्त ठेवली, ती राजवाड्यांच्या कोटीक्रमाचे कितीसे समर्थन करते, ते वाचकांनीच अजमाऊन पहावें म्हणजे झाले. खरी स्थिति अशी आहे की राजवाड्यांच्या कटाक्ष सहि करून कायस्थ प्रभूविषयी मराठ्यांची मने कलुषित करून विचरविण्याचा असल्यामुळे, नाटकी वकीलाप्रमाणे शक्य ती ओढाताण करून खऱ्याला खोटे ठरविण्याचा उपद्व्याप करणे त्याना प्राप्तच आहे. त्यांचा रोख चां. का. प्रभूच्या वेदोक्तावर आहे. मराठ्यांच्या नाही ज्यावेळी मराठ्यांच्या वेदोक्तावर राजवाड्यांचा परशुरामी डोळा फिरेल, तेव्हा हीच वाक्ये नुसत्या शब्दांच्या अदलाबदलीने मराठ्याच्या तोंडावर फेकण्यास ते थोडेच कचरणार आहेत हिस्टोरिकस्` नामक एक लेखक म्हणतो " The Vedokta therefore is a garb under which the pseudo Brahmins of African origin have been trying to give undeserved importance to their own tribe by the ladder of exclusiveness." (Bombay Gazette, Supplement 9-11-06) सन १९०६ च्या ऑक्टोबरच्या विविधज्ञानविस्तार मासिकानेंहि या बाबतीत एक अत्यंत स्पष्टोक्तीचा विस्तृत लेख लिहून चित्पावनांच्या ब्राह्मणपणाचा आणि वेदोक्त कारस्थानाचा बोजवारा चव्हाट्यावर आणलेला आहेच.
राजवाड्यांच्या विधानाचा थोडक्यांत समारोप करावयाचा म्हणजे आजपर्यंत वेदोक्त प्रकरणे वाढवून स्वराज्य आणि स्वधर्म यांचे तळपट उडविले ते फक्त चां. का. प्रभूनी आणि चित्पावन म्हणजे तेथून येथून सारे गरीब गाईंचे अवतार! मराठ्यांच्या वेदोक्त प्रकरणाचा किंवा चां. का. प्रभूवरील ग्रामण्यांचा इतिहास आपलाहि समग्र उपलब्ध आहे. इतकेच नव्हे तर छापूनहि प्रसिद्ध आहे. ‘परभू जातीनिर्णय` नामक महावेदाचे व्यास निळकंठशास्त्रीयते चित्पावन आयागो बाळाजीपंत नातू आणि राजवाड्याचे अत्यंत आवडते शतकृत्य करणारे अग्रेसर नरपुंगव चिंतामणराव आपा पटवर्धन यानी प्रतापसिंह छत्रपतीच्या कारकीर्दीत राजकारण, वेदोक्तप्रकरण आणि कायस्थप्रभू-ग्रामण्य यांची खिचडी बनविण्याकरिता जीं जीं अनन्वित कारस्थाने केली. त्यांचा इतिहास जर पाहिला, तर चां. का. प्रभूवर वरील तीन आरोप राजवाड्यांनी करणे म्हणजे चोरांनी उलट्या बोंबा मारणे होय. राजवाडचांचे धारिष्ट काय विचारावे? चां कायस्थ प्रभूं ही एक संशयित उत्पत्तीची रंडगोळक चंडगोळकासारखी पोटजात आहे, ती विश्वासघातकी व स्वराज्यद्रोही आहे, असले भयंकर आरोप करण्यांतही जे राजवाडे कचरले नाहीत. त्यानी वेदोक्ताचा आणि ग्रामण्याचा इतिहास उलटा वांचून त्यांतून चमत्कृतिजनक विपर्यासी विधाने काढल्यास आश्चर्य मानण्याचे काय कारण? क्रांतिकारक चळवळीच्या आद्यजनकत्वाचा मान पुण्यपत्तनस्थ चित्पावनांवर लादण्याचा उपक्रम केल्याबद्दल रौलट कमिटीवर आग पाखडणारे विद्वान्, आपल्याचपैकी कित्येक राजवाडे इतिहाससंशोधनाच्या नांवाखाली इतर जातींवर बेधडक कसकसले भयंकर आरोप निराधार लाटण्याचा नीच उपद्व्याप करीत असतात, याचा नीट विचार करतील. तर कायस्थ प्रभूंनी वेदोक्ताच्या चळवळी करून स्वराज्याचा खून केला, कां चित्पावनांनी आपल्या स्वतःच्या ज्ञातीचे नसतें महत्त्व वाढविण्याकरिता त्यांच्याविरुद्ध आणि छत्रपती तक्ताविरुद्ध अनेक कारस्थाने लढविली त्यांना त्यांनी आत्मसंरक्षणार्थ तोंड दिले याचा अधिक खुलासा करण्याचे आमचे श्रम खात्रीने वाचतील. रौलट कमिटीच्या आरोपांना एकतर्फी पुरावा आहे या सबबीवर त्यांचा निषेध करण्याची चळवळ करणारे स्वतःला चळवळ्ये, खटपट्ये या सदरात घालूं देऊ इच्छीत नाहींत. राजवाड्यांचा सारा पुरावा तर त्यांच्या दिव्य `समजुतीचा त्यांना अमूक असे वाटले` की मग त्यांना इतर पुरावे लक्षात घेण्याची जरूरीच भासत नाहीं, चांद्रसेनीयांवर जेव्हा चित्पावनांनी सत्तेच्या जोरांवर वेदोक्ताचा हल्ला चढविला तेव्हा याचा प्रतिकार करणे त्यांना केव्हाही प्राप्तच होते. अर्थात् प्राप्त कर्तव्य करणे म्हणजे नसत्यां चळवळी उत्पन्न करणें ही व्याख्या चांद्रसेनीयांना लागू करायला चित्पावन संशोधकांना आणि त्यांच्या जातभाईना सध्यां तरी तोंड नाहीं. रौलट कमिटीच्या रिपोर्टाचा धि:कार करतांना जीं चित्पावन तोंडे पुरावा दाखवा, पुरावा दाखवा म्हणून मोठा हलकल्होळ करीत, त्यापैकीं निदान तरी डझन अर्धा उझन तोंडे आपल्या कान डोळ्यांसह मंडळाच्या कंपूत आहेत. चां. का. प्रभूंवर विश्वासघातकीपणाचा आणि स्वराज्य नाशाचा आरोप करताच राजवाड्यांचा हात पकडून सदरहू आरोपाचा पुरावा त्या तोंडांनी ठिकच्याठिकाणी विचारायला नको होता काय? परंतु ते कसे होणार? चालले आहे; ठीक आहे, लेख रेकॉर्ड तर होऊ द्या. पुढचे पुढे! यापलीकडे त्या विद्वानांची मति जाते कशाला!
राजवाड्यांच्या वरील उद्गारांत समाधान मानण्यासारखे मानले तर एक विधान आहे. सातारचे मराठे व इतर मराठे हे `क्षत्रिय असल्यामुळे वेदोक्त संस्कारधिकार त्यांना पूर्ण होता` हे राजवाडे निदान येथे तरी कबूल करतात. परंतु ही त्याची कबुली म्हणजे केवळ हातचलाखी आहे. जे राजवाडे आणि त्यांचे पुण्यपत्तनस्थ कित्येक चित्पावन बंधु अगदी या घटकेपर्यंत कोल्हापूरच्या महाराजांची आणि त्यांच्या जातभाईची " वेदोक्त वेदोक्त" म्हणून थट्टा करीत आहेत, त्यांना कोणी सत्यप्रतिपादनाचे वाटेकरी बनविल, तर ते मात्र साफ चुकीचे होईल. त्यांनी चां. का. प्रभुसमाजाची बदनामी करण्याचा जो विडा उचलला आहे, त्या बदनामीला यथास्थित रंग यावा म्हणूनच हे विधान या संशोधकाच्या कलमांतून बाहेर पडले आहे.
हे चाणक्ष वाचकांना सांगणे नकोच. नाहींतर अजूनहि छत्रपतिवंशज मराठे, त्यांच्या राजधानीतील जगद्गुरु श्रीशंकराचार्य आणि चां. का. प्रभू यांबद्दल पुण्याच्या चित्पावनांचा द्वेष किती जळजळीत आहे. हे कोणाला नव्याने सांगायला पाहिजे असे नाही. आज कायस्थ प्रभूची बदनामी करायला मराठ्यांच्या वेदोक्तसंस्काराची कबुली द्यायची आणि उद्या कोल्हापूरच्या महाराजांची किंवा सर्रास मराठ्यांची बदनामी करायची वेळ आली की. कायस्थांच्या वेदोक्तसंस्काराचा पुरावा पुढे आणायचा, असली नाना फडणीसी करण्यात राजवाडे काय किंवा त्यांचे जातभाई काय चांगले प्रख्यात पावलेले आहेत. राजवाड्यांचा आणखी पुरवणीचा शेरा पहा, खुद्द छत्रपतींना यात गोविण्यांत चांद्रसेनियाचा असा मतलब होता की, मोठ्याच्या झगड्यात आपल्या खऱ्या किंवा खोटचा अधिकारांचे संरक्षण, गाड्याबरोबर नाळ्याच्या न्यायाने सहजासहजी व्हावे हा झगडा इतका विकोपास गेला की बाईच्या ब्राम्हणांनी प्रतापसिंहाच्या पदव्युतीकरिता अनुष्ठाने आरंभिली, साताराच्या राज्यात तट माजले, आणि या तटांच्या चुरशीत प्रतापसिंह राज्यभ्रष्ट झाला."
राजवाड्यांनी डोके खाजवून जी इतकी मानीनाथी केली त्याचा सारांश त्यांनी इतकाच काढला आहे की गाड्याबरोबर नळयाला यात्रा या न्यायाने चां. का. प्रभूंनी आपल्या खन्या किंवा खोट्या वेदोक्ताधिकाराच्या प्राप्त्यर्थ छत्रपतींना ग्रामण्याच्या भानगडीत ओढून, सरतेशेवटी प्रतापसिंहाचा गळा कापला. म्हणजे राजवाडे अप्रत्यक्षपणे असे ध्वनित करितात की मराठी राज्य चां. कायस्थ प्रभूंनी बुडविले.
प्रतापसिंहाची राज्यवष्टता का प्रभूंच्या ग्रामण्याने ओढवली का बाईच्या ब्राह्मणांच्या (?) अनुष्ठानाला संकरज परशुराम फळला म्हणून झाली, हे फक्त राजवाड्यांनाच माहीत परंतु शका १७६१ श्रावण वद्य १३ गुरुवार (सन १८३९) सकाळी ६ वाजता ओव्हान्सने प्रतापसिंह छत्रपतीस कैद करून नेल्या दिवसापासून तो शके १७६९ आश्विन शुद्ध ५ (सन १८४७ इ.) या दिवशी काशीस त्याचा काळ होईपर्यंत, चित्पावन नोकरशाहीचे शतसांवत्सरिक श्राद्ध चालणाऱ्या आणि मराठी स्वराज्याच्या अंताबद्दल नकाश्रु गाळणाऱ्या कोणकोणत्या चित्पावनाचे. स्वराज्यवादी वाडवडील छत्रपति प्रतापसिंहाच्या सुटकेसाठी आणि फितुरीच्या आरोपाचे निरसन करण्यासाठी इंग्रेजाशी अखेरपर्यंत झगडले, त्याच्या नावनिशीची यादी पुढे येत आहे काय? मराठी राज्य जानवी गंध पिठासाठी झगडून कायस्थानी बुडविले, का चित्पावन नोकरशाहीने स्वार्थ साधण्याचा अहंकारात बुडविले, हे सिद्ध करायला अहीमहीच्या रक्तबिंदूप्रमाणे (कोट्यावधी राजवाडे जरी निर्माण झाले, तरी चित्पावनांच्या निमकहरामपणाशिवाय त्याच्या हाताला इतर दुसरा आणखी पुरावा लागणे शक्यच नाही.)
प्रतापसिंहाची धार्मिक स्वयंनिर्णयाची चव त्यामुळे ब्राह्मणवर्गात भडकलेला `येदुक्ता` चा असंतोष चिंतामणराव सांगलीकराने ब्राह्मणेतरांना `शूद्राधमं शूद्राधम’ ठरविण्यासाठी केलेल्या दस्ताऐवजी उचापति, बाळाजीपंत नातूने राजकीय बाजूने महाराजांवर आणलेल्या खोट्या फितुरांच्या धारेपडी प्रतापसिंहाची उचलबांगडी, काशीची कैद तेथे मृत्यु स्वराज्याच्या पुनरुज्जीवनासाठी महाराजांच्या वतीने रंगो बापूजीने १४ वर्ष विलायतेस घातलेला धुमाकूळ वगैरे इतिहास फारच मोठा आहे. त्याच्या तपशीलाची रूपरेषा आम्ही स्वतंत्र प्रसिद्ध केल्याचे सर्वांना माहीतच आहे. पूर्ण तपशीलाचा ग्रंथ
शंभर वर्षापूर्वीचे महाराष्ट्र
अथवा
हिंदवी स्वराज्याचा खून
हा ग्रंथ ( शिवाजीचा राज्याभिषेक शक १०४ वर्षे चालला. सन १७७७ त दुसरा शाहू गादीवर आला तेव्हा नाना फडणीस व सखाराम बापू यांनी हा शक कागदोपत्री वेद करण्याचा हुकूम काढला. "(भारत इ. स. मे. अहवाल शके १८३५ पृ. ८७.) केवढी हो ही नामाची राजनिष्ठा?) लवकरच प्रसिद्ध करू.
निर्विकार चित्ताने या प्रकरणाबद्दल उपलब्ध इतिहास पाहिला तर असे आढळून येईल की मराठी राज्याचा काय किंवादुसऱ्या कोणत्याहि राज्याचा काय ज्यावेळी ऱ्हास होतो त्यावेळी त्याची कारणे ही तात्कालिक नसतात त्या कारणांचे बीज पूर्वीच पेरले गेलेले असून, त्याची पाळेमुळे एकदा चांगली खोलवर जाऊन रुतली म्हणजे मग ती कालवशात त्या राज्याचा पाया उलथून टाकण्यास समर्थ होतात. याच न्यायाने प्रतापसिंहाच्या सिंहासनाचा पाया आधीच अनेक द्वैताच्या घुगुरट्यांनी पोखरून पोखरून अगदी पोकळ करून ठेविला होता. अर्थात् ईस्ट इंडिया कंपनीच्या महत्वाकांक्षी मुत्सद्यांना ‘तू नाही तर तुझा बाप` अशा प्रकारच्या फोलकट सबबीवर छत्रपतीच्या सिहासनाच्या चारहि तंगड्या उपटून फेकून देणे फारसे कठीण गेले नाही, त्यावेळची प्रतापसिंहाच्या विरुद्ध सुप्रसिद्ध चित्पावन आयागो बाळाजीपंत नातूच्या सलवाने चालणारी शहाजी उर्फ आप्पासाहेब महाराजांची कारस्थाने आणि पेशव्यांच्या छत्राखाली चित्पावन समाजाने सातारकर छत्रपतीचा उघड उघड चालविलेला द्रोह व छळ इ. अनेक आत्मघातकी गोष्टी जर नीट लक्षात घेतल्या तर मराठी राज्याच्या ऱ्हासास प्रभुची ग्रामण्ये कारणीभूत झाली हा राजवाड्याचा सिद्धांत किती धाडसी आणि मत्सरी ठरतो हे सांगणे नकोच. छत्रपतीच्या तक्ताला आंतून पोखरणारी चित्पावन नोकरशाहीची वाळवी आपल्या घरात येऊ देण्यात श्री शाहू छत्रपतीनी व चिटणीसानी जी घोडचूक केली. तिथेच पर्यवसान मराठी स्वराज्याच्या ऱ्हासास कारणीभूत कसे झाले. याबद्दल अँट डफची कबुली पहा :
"The chain by which the crafty Brahmins thereafter contracted
powers of Shahu Maharaja and made the successive Satarkars merely the
nominal powerless kings, had its first link thus coined and made strong by
Shahu himself."
न्या. रानडे हेंच सांगतात :--
`पुढे सर्व कारभार साताऱ्याहून पुणे मुक्कामी नेल्यावर वरील सर्व अधिकार पिढीजाद झाले; पण ते अधिकार बाळगणाऱ्या लोकांचे राज्यकारस्थानमंडळीत वजन पडेनासे झाले. शाहूराजानंतर जे दोन राजे झाले त्यांच्या अंगी या राजांच्या नावावर पेशवे जो अधिकार गाजवीत, तो धारण करण्याची योग्यता नव्हती नावाने राजे मात्र पण त्यांच्या वागणुकीवर अगदी सक्त देखरेख असे पेशव्यांचे हातातील बाहुली म्हटले तरी चालेल. पेशव्याला अधिकाऱ्याच्या दिलेला सनदा रद्द व्हाव्या म्हणून दमाजीने पुष्कळ खटपट केली. पण ती व्यर्थ गेली. नंतर सातारच्या राजास तेथील किल्ल्यांत अटकेत ठेविलें व नोकरचाकर, गाडीभाडे वगैरेच्या खर्चाकरिता तीस हजार रुपयांची त्याचेकडे नेमणूक झाली. याप्रमाणे सातारचे राजे बंदिवासाचे महद्दुःख भोगीत राहिले." म. स. उ. पृ. १८३.
याच मुद्यावर श्रीयुत माधवराव लेले म्हणतात:--
"सातारकर छत्रपति प्रतापसिंह यांच्या पदभ्रष्टतेला मूळ कारण कायस्थ प्रभू हेही विधान वरील तिन्ही विधानाप्रमाणेच आभासात्मक दिसते. या प्रकरणासंबंधाचे तत्कालीन कागदपत्र पाहता असे दिसून येते की, या कामांत प्रतापसिंह महाराजांवर गैरसमजुतीने व लालगे लोकांच्या स्वार्थसाधू सांगण्यावर व त्यांनी खरा म्हणून पुढे आणलेल्या लेखी पुराव्यावर भरवसा ठेवून, त्यांना पदच्युत करण्यामध्ये त्यांच्यावर भारी जुलूम झाला असे प्रकार तेव्हांप्रमाणेच अलीकडेही नाहीत असे नाहीं. याचा दोष त्यावेळचे दिवाणजी बाळाजीपंत नातू प्रतापसिंह महाराजांचे बंधु-त्यांच्या पदच्युतीने स्वार्थ साधून गादी मिळालेले अप्पासाहेब महाराज व इतर तत्पक्षीय मंडळी यांच्याकडेच विशेष येतो. त्यावेळी कायस्थांवरील ग्रामण्य उपस्थित झालेले होते व त्याच्यांत प्रतापसिंह महाराजांनी कायस्थाचा पक्ष घेतलेलाही असेल पण प्रतापसिंह महाराजांवरील दोषारोपासंबंधाने कायस्थ मंडळीला दोष लावण्याला पुरेसा पुरावा किंवा ऐतिहासिक साधन उपलब्ध नाही.
सातारच्या गादीवरून प्रतापसिंह महाराज पदच्युत करण्यात आले, त्याचप्रमाणे सिंध प्रांतात थोड्या वर्षानंतर काहीसा त्याच मासल्याचा प्रकार घडून आला. सिंधप्रांत इंग्रजांनी काबूलच्या पहिल्या मोहिमेनंतर खालसा केला, त्यावेळी खैरपूरचे मीरअली मुरादखान यांना त्यांनी हाती धरले होते. या वेळी त्यांनी इंग्रजांशी चांगला सलोखा केला होता, व त्यांचे असे ठरले होते की, चढाईच्या पूर्वी अलीमुरादखान यांच्याकडे जो प्रांतभाग होता तो त्यांच्याकडे कायम राहावा, व त्यांना त्या सिंध प्रांतात अग्रेसर मीर समजले जावे, सिधप्रांत खालसा होऊन सर्वत्र स्थिरस्थावर झाले. काबुलची फौज परत आली. इंग्रजांचा चांगला जम बसला. नंतर जिंकून घेतलेल्या एका मीराच्या सांगण्यावरून, मीरअली मुराद यानी आपल्या वास्तविक हक्कापेक्षा जास्त प्रांत दाबला आहे अशाबदर काम चालले. अखेर त्यांनी पहिल्या मीराशी वाटणीचा तह झालेला होता त्यात लिहिलेल्या गांवाच्या ऐवजी मीर अली मुराद यानी ते ते तालुके दाबले आहेत व ते आपले आहेत असे करण्यासाठी तहाच्या कलमांत फेरफार केला आहे, असे ठरवून तेवढा भाग त्यांच्याकडून परत काढून घेतला गेला व त्यांचा बराचसा अपमानही करण्यांत आला. तात्पर्य, अशा गोष्टी सुव्यवस्थित व दिवसेंदिवस बळावत व वाढत जाणाऱ्या राज्यांतही घडून येतात. पण त्यांच्यासाठी एखाद्या विवक्षित वर्गाला किंवा जातीला दोषी धरणे योग्य नाहीं. वि. ज्ञा. वि. एप्रिल १९१९
कलम १८ पृ. ४१ येथे राजवाडे ठणकावून देतात की " याज्ञवल्क्य स्मृतीत कायस्थ न हि विश्वसेत” असे वाक्य आहे. याज्ञवल्क्याच्या प्रचलित निरनिराळ्या प्रति आम्ही तपासून पाहिल्या, पण त्यांत वरील विधिवाक्य आम्हाला कुठेही सांपडलें नाहीं. कदाचित आमची नजरचूकहि असेल.
राजवाड्यांनी तसदी घेऊन अध्याय व श्लोक दिला असता तर बरें होते. पण त्यावरून एक तरी समाधान आहे की, ज्याअर्थी "यज्ञवल्क्यस्मृती व तीवरील - विज्ञानेश्वराची टीका महाराष्ट्रांत पुरातन कालापासून प्रमाण धरतात." असे राजवाडे म्हणतात. त्याअर्थी निमकहराम कायस्थांचा इतिहास याज्ञवल्क्याच्या पूर्वी बराच प्रसिद्ध असला पाहिजे; त्याशिवाय पुरातन कालापासून प्रमाण असलेल्या या ग्रंथात हे विधिवाक्य आलेच नसते. शिवाय सन १६२८ च्या पलीकडे राजवाड्यांना जो अंधार दिसत होता, त्या अंधारातसुद्धा कायस्थाच्या इतिहासाबद्दल हे विधिवाक्य कुलाब्याच्या दांडीप्रमाणे त्यांना आढळले म्हणावयाचे. कायस्थांना विश्वासघातकी ठरविणारा हा राजवाड्यांचा याज्ञवल्क्य कोण असेल तो असो. पण याज्ञवल्क्यस्मृती अध्याय १, श्लोक ३३३ मात्र असे स्पष्ट सांगत आहे की, "चोर दुष्ट आणि घातकी लोकांपासून त्रस्त झालेल्या प्रजेचें संरक्षण कायस्थानीच केले. कायस्थ विश्वासार्ह आहेत की विश्वासघातकी आहेत, याची साक्ष द्यायला राजवाडे उगाच इतक्या पुरातन काळच्य अंधाऱ्या युगात धावत गेले! आजची ब्रिटिश यज्ञवल्क्यस्मृती पाहिली तर कायस्थ न हि विश्वसेत च्या ऐवजी
चित्पावनं न हि विश्वसेत्
असे विधिवाक्य मात्र हजारों दप्तरातून आढळेल. प्राचीन इतिहासातील गोष्टी काढून उगाच कोळसा कशाला उगळावा? प्रचलित परिस्थित्यनुरूप सध्यांचा इतिहास काय आहे आणि निरनिराळ्या जातीची वृत्ति कशी पालटली आहे, याकडेच सर्वांनी लक्ष द्यावे!असे आमचे कित्येक चित्पावन मित्र आम्हांला नेहमी उपदेश करीत असतात. म्हणूनच त्या उपदेशाला मान देऊन आम्ही म्हणतों की प्राचीन याज्ञवल्क्याच्या किंवा पराशरांच्या स्मृति पाहण्यापेक्षा अर्वाचीन चालू याज्ञवल्क्यांच्या आणि पराशराच्या स्मृति पाहिलेल्या बऱ्या याज्ञवल्क्याच्या स्मृत्याधारे राजवाड्यांनी पुढे असा मथितार्थ काढला आहे की, महाडापासून जंजीऱ्यापर्यंतच्या टापूत चांद्रचेनीय कायस्थ व मुंबईपासून दमणपर्यंतच्या टापूत चांद्रसेनीय पाताणे प्रभु एवढी दोन कुळें तेवढी शिलाहारांच्या अमदानीत कोकणात आलेली आढळतात.
बाकी महाराष्ट्राच्या इतर सर्व प्रांतात कायस्थांना पक्का काट मिळालेला दिसतो. पेशवाईतल्या छळांना कंटाळून पुण्यातील कायस्थ प्रभुमंडळ सातारा, नागपूर, बडोदें, ग्वालेर, देवाच, इंदूर, मुरुडजंजिरा वगैरे ठिकाणी निघून गेल्याचे इतिहासकांस माहीत आहेच. या संस्थानांत कायस्थांची काय भरभराट झाली. त्यांचा किती भाग्योदय झाला आणि यांपैकी कित्येक संस्थानाची फासावर लटकलेली मान केवळ कायस्थ दिवाणांच्याच अक्कलहुषारीने वेळोवेळी कशी सफाईत सोडविली गेली, याचा इतिहास शोधायला फार दूर जावयाला नको. आजहि य संस्थानांतून कायस्थ प्रभूंचा जितका भरणा आहे, तितका राजवाड्यांनी आखून ठेवलेल्या क्षेत्रांतहि नाहीं, हें आंधळ्यालासुद्धां दिसणारे आहे. या क्षेत्राव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या इतर भागांत कायस्थांना पक्का काट मिळाला असेल तर तो मग कोठे? आजहि महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरील सर्व स्वदेशी संस्थानांतून चां. का. प्रभूच दिवाणादि महत्त्वाच्या जाग्यावर अझून झळकत आहेत आणि इतर जातीतील अधिका-यांपेक्षा प्रत्येक दर्जाच्या खात्यांतून कायस्थ प्रभु कामगारांचीच संख्या अधिक आढळते. फार काय पण ब्रिटिश रियासतईत मुन्सफी मामलेदारीच्या जागांवर कायस्थ प्रभुंच्या नेमणुका अलीकडे (?) फार झाल्या आहेत म्हणून रा. रा. नरासिंह चिंतामण केळकर यांनी आपल्या मराठे आणि इंगज पुस्तकांत अप्रत्यक्ष खेदयुक्त उद्गार काढले आहेत.
कायस्थ प्रभूची जात जर याज्ञवल्क्याच्या पूर्वीपासून नहि विश्वसेत् इतकी निमकहरामी होती, तर अझूनपर्यंत स्वदेशी संस्थानातून आणि ब्रिटीश रियासतीत कायस्थांना अधिकाराच्या जागा देण्यांत संस्थानिकांचा आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांचा जो विशेष ओढा आहे. तो काय त्या त्या संस्थानिकांचा मूर्खपणा म्हणून की काय? आज पर्यंत स्वदेशी संस्थानिकाशी द्रोह करणारे किंवा कुटिल नीतीने त्यांच्या अधिकाराचा स्वापहार करणारे कितीकसे कायस्थ राजवाड्यांच्या डायरीत नमूद आहेत? मल्हारराव गायकवाडाच्या बंडाच्या वेळी रामराव आपाजी फणशानीच गायकवाडी वाचविली. काठेवाड दिवाणजीचा इतिहासहि तितकाच उज्वल आहे. इंदूर, धार, देवास, ग्वालेर इ. संस्थानाबद्दलहि कायस्थ प्रभू अधिकाऱ्यांची स्वामिनिष्ठेची कामगिरी ठळक ठशात प्रसिद्ध झालेलीच आहे. मल्हारराव गायकवाडांचे साथीदार म्हणून ज्या ३२ दुष्ट आणि कारस्थानी लोकांची यादी रा लोकहितवादींनी (भाग १, पृ. १२५ वर) दिली आहे, त्यात एका तरी कायस्थाचे नाव राजवाडे दाखवून देतील काय? (भाग १, पृ. १५१-५२ वर वर) लो. हि. नी पेशवाईच्या काळातील सुप्रसिद्ध दुष्ट लोकांची महिती दिली आहे. त्यांत (१) गुलाम कादर (२) सर्जेराव सखाराम घाटगे (३) सिदोजीराव आप्पा देसाई निपाणकर (४) हरिपंत भावे आणि (५) परशुरामपंत प्रतिनिधी, ही नावे दिलेली आहेत यात कोण कायस्थ आहे तो राजवाड्यानींच दाखवावा. एकूण आपल्या मत्सरी कल्पनेला भाडोत्री याज्ञवल्क्याचा पेहराव घालून राजवाड्यानी कायस्थ प्रभू समाजावर जो विश्वासघातकीपणाचा आरोप आणलेला आहे, त्याला ऐतिहासिक पुरावा मुळीच नाही अर्थात् हा आरोप म्हणजे चां. का. प्रभू ज्ञातीची.
शुद्ध बदनामी होय,
असे म्हणायला काही हरकत नाही चां. का. प्रभू ज्ञातीतील एकहि इसम आज मितीला आंदमान बेटांत पाण्याची शिक्षा भोगण्यास गेलेला नाही. एखाद्यावर राजकीय खुनाचा आरोप आल्याचे कोणाच्या ऐकिवात नाही. अलीकडे राजकीय स्वरूपाच्या कितीतरी मोठमोठ्या चळवळी झाल्या, परंतु एकहि कायस्थ प्रभु राजद्रोहाच्या आरोपांत सांपडलेला नाहीं.कितिएकांच्या प्राचीन इनाम जमिनी किंवा इतर हक्क सध्या नाहीसे झाले आहेत. राजकीय क्षेत्रांतील त्यांचे असावे तितके महत्व इतर सर्व जातीप्रमाणेच सध्या राहिलें नाहीं. तरीसुद्धा ब्रिटीश सत्ताधारी लोक आणि त्यांची सरकारी दप्तरे ही कायस्थ प्रभूना "conspicuosly Joyal" असा शेरा देत आहेत.
सुप्रसिद्ध आंग्ल इतिहासकार किंकेड साहेब तर त्यांना The most attractive and lovable community" असाच शेरा देतात. कायस्थ प्रभू मुसलमानांशीहि निष्ठेने वागले. या बद्दल खुद्द शिवाजीचेच उद्धार आहेत. मराठे छत्रपतीविषयींची त्यांची अनन्य भक्ति आणि स्वराज्यानिष्ठा इतिहासप्रसिद्धच आहे. याबद्दल सर जेम्स कॅबेल, सर हर्बर्ट रिस्ले आणि ऑन. इम. एन्थोंवेन यांनीही प्रशंसापर उद्गार काढलेले आहेत. स्वदेशी संस्थानांत जर एखाद्या कायस्थ प्रभूनें नोकरी पत्करली, तर त्या संस्थानिकाच्या ऱ्हासाबरोबर तो स्वतः हि खाली पडतो आणि त्याच्या भरभराटीतच स्वतःचा उत्कर्ष करून घेतो. परंतु राजाचा सत्यानाश झाल्यावर त्याच्या दुर्दैवाचा फायदा घेऊन स्वतःची तुंबडी भरणारा कायस्थ प्रभु मिळणेच शक्य नाही.
काठेवाड काबीज करून साऱ्या गायकवाडीला बगलेत मारणारे आणि ‘ज्या दगडाला शेंदुर फांशीन त्याला गायकवाड करीन` अशी कर्तुमकर्तुमन्यथा कर्तुम् सामर्थ्य एक वेळ ज्या काठेवाड दिवाणजीच्या हातांत होते, त्याला गायकवाडी आपल्या घशांत उतरायला काही अडचण नव्हती. पण नाहीं, असला परस्परापहार करणें
कायस्थ प्रभूंचें ब्रीद नव्हे!
धन्याची मान कापून स्वतःचा तळीराम गार करण्याची जी किळस आणणारी काही ठळक उदाहरणें मिरपूरखास, कोल्हापूर, लाहोर, पुणे, बडोदें, सातारा वगैरे ठिकाणी घडून आली, ती बहुतेक ब्राह्मणांच्या हातूनच घडलेली आहेत, हें इतिहासज्ञांस सांगणे नकोच, कायस्थ प्रभू मुसलमानांच्या विरुद्ध लढले, मराठ्यांच्याहि विरूद्ध लढले, फार काय छत्रपतीच्या वतीने इंग्रजाच्याहि विरुद्ध त्यानी लढण्यास मागें पुढें पाहिलें नाहीं. हें सारें. का? तर एका स्वामीनिष्ठेकरिता. हा स्वामीनिष्ठेचा एकच गुण त्यांच्या नैसर्गिक रक्ताची साक्ष देण्यास पुरेसा आहे. म्हणूनच स्वदेशी संस्थानांतून काय अगर ब्रिटिश रियासतीत काय, कायस्थ प्रभू अधिकारी असला म्हणजे तेथील कारभाराबद्दल राजाला मुळींच फिकीर वाटत नाही.
भाग ७
प्रस्तुत पुस्तकांत आम्ही राजवाड्यांच्या लेखातील ठळक ठळक आरोपांचाच विशेषतः विचार केला आहे. त्यांच्या लेखाचे स्वरूप आणि हेतूच इतका बेजबेबदार आहे की, ज्यांत कायस्थ प्रभूंची बदनामी नाही, अशी एक ओळहि सांपडणार नाही, असे सामान्य विधान केल्यास अतिशयोक्ति होईलसें वाटत नाही. कायस्थ प्रभूंवरील स्वराज्यद्रोहाच्या भयंकर आरोपाचा विचार करण्यापूर्वी राजवाड्यांच्या काही त्रोटक आक्षेपांचा येथे विचार करणें बरें.
नऊ कलमी कतब्याचे काय झालें?
सन १९०७-०८ सालच्या स्वदेशी चळवळींत श्री. नरसोपंत केळकर, संपादक केसरी, हे खटला होऊन ठाण्याच्या जेलमध्ये असतांना, त्याच्याकडून सरकारने एक काही अटींचे माफीपत्र लिहून घेऊन त्यांची सुटका केल्याने पुष्कळांना स्मरत असेल. अशाच प्रकारचा एक नऊ कलमी भिक्षुकी अटींचा कतबा उत्सवमूर्ती नारायणराव पेशव्यानें कायस्थ प्रभूंच्या प्रतिनिधींकडून मोराबादादाच्या वाड्यांत बळजबरीनें सह्या करून घेतला होता. याची विस्तृत तपशीलवार हकीकत आमच्या ` ग्रामण्य ग्रंथां’त पृ. ३८, ३९ वर दिलेली अवश्य पहावी.
हा नऊ कलमी कतबा येणें प्रमाणे :--
(१) वैदिक मंत्रेकरून कांहीच कर्म करणार नाहीं.
(२) वैदिक मंत्र येत असतील त्यांचा उच्चार कणार नाहीं.
(३) भाताचे पिंड करणार नाही.
(४) देवपूजादिक विहित कर्म पुराणोक्त मंत्र करूनच करूं व ब्राह्मणभोजन आपले घरी करणार नाहीं.
(५) शालीग्रामपूजा करणार नाही.
(६) ज्या देवास शूद्र जातात त्या देवास जाऊं.
(७) ब्राह्मणांना दंडवत मोठचानें म्हणत जाऊ व आपले जातीतहि दंडवत म्हणत जाऊ.
(८) वैदिक ब्राह्मण व आचारी व पाणके व शागिर्द ब्राम्हण व ब्राह्मण बायका चाकरीला ठेवणार नाही व आपले घरीहि ठेवणार नाही.
(९) आमच्या जातीमध्ये संतोष पाट लावतील त्यांना आम्ही अडथळा करणार नाही.
चां. का प्रभूच्या ग्रामण्याबद्धलचा नऊ कलमांचा हा कतबा आधुनिक चित्पावन-संशोधकांच्या मोठ्या कौतुकाचा एक विषय होऊन बसला आहे. कारण बऱ्याच विद्वानांनी हा बऱ्याच निरनिराळ्या ठिकाणी बऱ्याच वेळा प्रसिद्ध करण्याचें पुण्य संपादन केले आहे. जणु काय हा नऊ कलमांचा कतबा म्हणजे त्यांना " Nine wonders of the world" वाटतो की काय कोण जाणे! वासुदेवशास्त्री खरे यांनी आपल्या ऐतिहासिक लेखसंग्रहाच्या आठव्या खंडात त्याचा जीर्णोद्धार केला आहे. धुळयाच्या हवेत निर्माण होणाऱ्या `इतिहास आणि ऐतिहासिक’ मासिकानेहि पहिल्या वर्षाच्या १२ व्या अंकांत त्याचे श्राद्ध घातले आहे. आणखी कितीतरी ठिकाणी तो छापला गेला आहे. त्यांची नावनिशी कोठेवर द्यावी? आमची या सर्व विद्वानांना एक विनंती आहे. त्यानी [हा-
परशुरामी ताम्रपट
ब्राँझ धातूच्या जाड पत्र्यावर रिलीफ तशात खोदवून भा. इ. स. मंडळाच्या लोखंडी मंदिरांत कायमचा स्थापन करावा,म्हणजे ठिकठिकाणी निरनिराळ्या प्रसंगी नकला छापून त्याच्या अमरत्वाची अशी कागदी काळजी वाहण्याची खटपट कायमची दूर होईल, नारायणराव पेशव्याच्या उरावर जाळलेल्या चां. का. प्रभूच्या ग्रामण्याबद्दलचा हा दस्तेएवज चितापावन होऊन हजारों चित्पावनांच्या घरांत अस्सल म्हणून जरी अवतीर्ण झाला तरी त्यात काही मोठीशी आपत्ति चो. का. प्रभूवर येणार नाही.
आमच्यासारखे आधुनीक कायस्थ तर आज या कतव्यापेक्षाहि दहा मैल पुढे जातात. वैदिकमंत्रच काय, पण कोणत्याच मंत्रानें कांहींहि करणार नाही. मंत्र लागलेच तर स्वतः मराठी व इंग्रजी रचून देवाला आळ शाळीग्रामच काय पण कोणताहि दगड धोंडा पुजणार नाहीं हातांत सांपडला तर बँकबे बुजवायला मुंबईच्या डेवलमेंट डिपार्टमेंटला देऊ. भाताचे पिंड करणार नाहींच पण कशाचे मातीचे सुद्धा करण्याची इच्छा नाही. ब्राह्मणाचे देऊळहि आम्हाला नको आणि शूद्राचेंहि नको. देवळांत देव असतो, ही भिक्षुकी कल्पनाच आम्हाला मान्य नाहीं. संतोषे पाट लावण्यापेक्षां शक्य तर जबरीनें लावण्याची सुद्धा सुरू करू. ब्राह्मण भोजणाची व ब्राह्मणी अडत्येगिरीची ब्याद सुटली तर महामारीच गेली असे समजू. ब्राह्मण आचारी पाणक्ये धोतरबडवे यांना कायमचा झाडू देण्यास मुळींच हरकत नाही. पण ते बिचारे आमच्या आश्रयाच्या अभावी उपाशी मरतील त्याची वाट काय? हल्ली पर्वतीवर रमणा नसतो. दंडवताची मात्र मोठी पंचाईत आहे. हल्लीच्या गुडमॉर्निंग साहेबजी हल्लीच्या रामरगाड्यांत दंडवताचा व नमस्काराचाहि मुर्दा पडला आहे. मुर्द्याला कोण लेक जगवितो? आशा आहे की, या मुर्दाच्या निर्मल स्वराज्यासाठी वेदनारायण फारसे सुतकी बसणार नाहीत. आमचे आजचे विचार हे असले तरी १८ व्या शतकातला कायस्थांना हा कतबा म्हणजे त्यांच्या अस्तित्वावरच झुगारलेला आकाशाचा वज्राघात असाच वाटला का वाटू नये? मगरूर पेशव्यानी तो कायस्थांवर झुगारण्यांतला हेतु एवढाच की, त्यांना लौकिकी दृष्टीनें कमी दर्जाचे ठरवावे. म्हणजे आज तुमचे आमचे विचार कितीही पुढे गेलेले असले, तरी १८ व्या शतकांतल्या पेशव्यांच्या व कायस्थांच्या उच्चनीचतेच्या व ब्राह्मण-शूद्रत्वाच्या कल्पना कशा होत्या, हें या परशुरामी आणि घाशीरामी फतव्यावरून खासें समजून येईल, तरी सुद्धां (बाजीरावाने मस्तानीला अर्धांगी केली व समशेर बहादराच्या मुजीचा प्रयत्न केला)
एवढ्यावरून हिंदुमुसलमान- ऐक्याचें श्रेय बाजीरावाच्या पदराला बांधणारे किंवा स्वतःच्या ब्राह्मणपणाची थप्पी कायम साधण्यासाठी चित्पावनेतर ब्राह्मणांच्या मुलींशी जबरीचे विवाह ठोकणाऱ्या नानासाहेबाला हिंदुसंघटनाचे आद्योत्पादक बनविणारे ज्ञानकोशकार डॉक्टर केतकर नारायणराव पेशव्याच्या प्रेतावर प्रगमनशीलतेची शालजोडी पांघरण्यास कमी करणार नाहीत. हा प्रकार घरांत खडखडाट असणाऱ्या बुभुक्षितानें महाशिवरात्रीचा उपास केल्याची पुण्याई लाटण्यासारखाच आहे.
मंडळाच्या (चैत्र-भाद्रपद शके १८३४) च्या अहवालांत कै. पां. न. पटवर्धन यांनी `प्रभूप्रकरणी’ दोन निवाडपत्रे देऊन, नारायणराव पेशव्याच्या ९ कलमी कतब्याचा उताराहि त्यांत दिला आहे. पटवर्धन म्हणतात कीं, सदरहू पत्राचे अस्सल वाई क्षेत्रांतील ब्राह्मणाजवळ आहे. (अस्सल कोणते आणि नक्कल कोणतें) हें ठरविण्याचा अधिकार आजकाल चित्पावन संशोधकांनी आपणाकडे राखून ठेविला आहेच. तथापि बखरी पाहिल्या तर नाना फडणीस यांस मुद्दाम तांतडीनें सदर्हू यादी दप्तरांतून काढून द्या. त्याशिवाय नारायणरायाचे प्रेत कायस्थ मंडळी उचलून देत नाहींत, असा दादासाहेबांचा निरोप पोचतांच. "तेव्हां नानांनी रुमाल आणून कावून दिली. ती याद सखाराम हरीश दिली. यांनी विनंती केली, की आपले हाते फाडून द्यावी. तेव्हा दादासाहेबांनी श्रीकार फाडून दिली. ती व्यंकटराव काशीचे हातीं सखाराम हरीनें दिली. व्यंकटराव काशीनें ती याद फाडून पूरजे करून शवावर टाकीले. नंतर शव उचलून पुढी विधि झाला." ही बखरीची साक्ष आहे, तेव्हा वाईच्या ब्राह्मणाजवळ अस्सल आली कोठून? बरें, अस्सल नष्ट झाली म्हणजे नकल राहतच नाही, असें थोडें आहे! परंतु ‘नकल हीच अस्सल` असा हट्ट धरणान्या आणि ज्या प्रकरणाबाबत ती नकल असते, त्या प्रकरणाचा कायमचा निकाल लागला असतांहि ती पुन्हां जशीच्या तशी झणु काय, ती आता अगदी नवीनच उपलब्ध झाली अशा दिमाखानें प्रसिद्ध करणे, म्हणजे संशोधनाच्या शहाणपणाचा कळसच झाला म्हणावयाचा!
उद्यां सरकारी दरबारी चालणाऱ्या खटल्यांतील पुराव्यांच्या कागदपत्रांबद्दल जर हीच पद्धति सुरू केली, तर या असल्या खटल्यांच्या निकालांच्या आवृत्यांवर आवृत्या देण्यासाठी सरकारला दरएक गांवाला दहा दहा कोर्ट निर्माण करावी लागतील. परंतु इतका पोंच आमच्या पटवर्धनांना राहील कसा! त्यांनी यमाजी शिवदेवाच्या वेळच्या चां. का. प्रभूवरील ग्रामण्याच्या आरोपाचे एक पत्र असेच छापले आहे. त्याचाहि योग्य तो निकाल लागलेला आहेच. नानासाहेब पेशवे यांनी शाहूमहाराजाकडून आज्ञापत्र आणवून ग्रामण्याचे मुख्य चळवळ्ये प्रतिनिधी आणि त्यांचे कारस्थानी मुतालीक यमाजी शिवदेव या दोघांनाहि अखेर तुरुंगांत रवाना केल्याचा मनोरंजक इतिहास म. स. उत्कर्ष पृ. १५५-१५६ वर ज. रानडे यांनी दिलाच आहे अर्थात् असली आरोप पत्रे वारंवार नवीन पुरावा म्हणून प्रसिद्ध करणे, हे मत्सरी व कुत्सित चित्पावनांना फार चांगले साधते.
`शिवराज प्रशस्तिव कायस्थ धर्मदीप या फाटक्या तुटक्या चोपड्याचे संशोधन करण्याच्या सबबीवर राजवाड्यानी कायस्थांविषयी इतक्या अनेक अवांतर गोष्टींची नालिस्ती केली आहे की नालिस्ती करावयला गोष्टच उरली नाहीं. म्हणून अखेरीस कायस्थांना त्यांच्या आईवरून एक सणसणीत शिवी हासडण्याचेच त्यांनी बाकी ठेवले आहे. त्याशिवाय बाकी सर्व संस्कारांची त्यानी वाटलेली मुबलक खैरात स्थितप्रज्ञाप्रमाणे निमूट सहन करणाऱ्या सर्व गलघट कायस्थाग्रणींनी राजवाड्याचे मनःपूर्वक आभार मानले पाहिजेत, कायस्थ धर्मदीपांतल्या तेलवातीची चिकित्सा करण्यासाठी राजवाड्यानी केवळ मुळाशीच हात घातला असें नव्हे, कायस्थाच्या टाळक्यावरहि तो सफाई फिरविला आहे. त्यांना कायस्थ प्रभूचें पागोटेंहि सहन होत नाही.
राजवाड्यांनी पृ. ४८ वर आपल्या ज्ञातिबांधवांची व्याजस्तुति करण्याच्या भरात असे एक विधान ठोकून दिले आहे की `दंडवताच्या ऐवजी नमस्कार’ घेण्याकरितां कायस्थांनी रण माजविलें, आणि ब्राह्मणी पागोटें मस्तकावर चढविण्याकरितां कायस्थ दोनशे वर्षे हैराण झाले. हा अद्वितीय शोध त्यांना कोणच्या गळाठ्यांत सांपडला असेल तो असो, परंतु प्रचारांत कायस्थांनी कधि `दंडवत` शब्द नमनविधीला वापरल्याचें इतिहासांत सापडत नाहीं. राजवाड्यांना या विधिवाक्याचा ताम्रपट जर उपलब्ध झाला असेल तर तो त्यांनी अवश्य प्रसिद्ध करावा म्हणजे सध्या साहेबजी, हल्लो, आयसे मिस्टर, गुडमॉर्निंग करण्यांत फुशारकी मारणाऱ्या सुधारक कायस्थांच्या आधुनिक नमनप्रघातांत दंडवताची फोडणी घालण्याला कोणी आडवा येणार नाहीं. आता पागोट्याबद्दलहि असेंच आहे. ब्राह्मणें डोकींवर शिपतरें चढवू लागली आणि कित्येक कायस्थ तर आता बोडके फिरण्यांतच शेखी मिरवू लागले आहेत. अर्वाचीन इतिहासाची प्रमेयें सोडविणें राजवाड्यांचा हातचा मळ जरी असला, तरी तसे करणे आम्हाला अप्रयोजक वाटतें. एखाद्या आधुनिक चित्पावनाने किंवा कायस्थानें मराठणीशी विवाह केला. म्हणजे त्यांचे पूर्वजहि तसेच होते हें विधान करणे जितकें बाष्कळपणाचे होईल, तितकींच सध्यांची कायस्थ फेटे किंवा टोप्या घालतात किंवा बोडके फिरतात म्हणून त्यांच्या वाडवडीलांच्या पागोट्यावर हल्ला करणें हेंहि चावटपणाचेंच ठरेल. ब्राह्मण मंडळी पागोटी कधीपासून घालू लागलीं याचा इतिहास शोधायला अगदीच कांहीं अंधाऱ्या युगांत जावयाला नको, श्रीवर्धनच्या कायस्थ प्रभु (केळशीकर प्रधान) कुळकर्ण्याच्या घरी कारकुनी करणारे बाळाजी विश्वनाथ जेव्हां कोकणातून घाटावर आले त्यावेळी ते ब्राह्मणी पागोटें घालून आल्या वेळचा त्यांचा एकादा फोटो ठाणे येथील कोपिनेश्वराच्या पडक्या भिंताडांतून बाहेर पडलेला असल्यास नकळे! चां. का. प्रभूच्या पागोट्याचे मूळ मात्र फार खोलवर गेले आहे. राजवाडे संशोधकांनी किंचित् श्रम घेतल्यास तेंहि त्यांच्या सहज हाती येईल. प्रख्यात ज्योतिर्विद मुकुटमणि के जीवनराव चिटणीस म्हणतात. "प्राचीन काळ”चे चां. का. प्रभु हे नाग देशांतील रहाणारे होते. नागाचे वर्ष श्रावणांत सुरू होते. `वर्ष` हा शब्द पर्जन्यदर्शक आहे. नागदेशांत पांच ऋतु होते. म्हणून पंचमी तिथी हा वर्षारंभ मानून नागाची पूजा पंचमीस करतात. नागपंचमी आणि नागपूजन यांचे महत्व चां. का. प्रभु ज्ञातीत अझूनहि बरेंच आहे. चां. का. प्रभु हे नागदेशांतील असल्यामुळे त्यांचें शिरस्त्राण अथवा पागोटें हें नागचिन्ह आहे. पागोट्याचा घेर नागाचे क्षेत्र किंवा वेटाळे होय.
कोकी ही त्याची फडा नागाची फडा रुंद झाली म्हणजे त्यावर दहाचा आंकडा झळकू लागतो त्याप्रमाणे कोकीच्या मधोमध एक जरीचा पदर आलेला असतो. दुसरा जरीचा पदर हें शेपूट पागोट्याच्या पिळांचे आणि नागाच्या वेटाळ्यांचें साम्य आहे. चांद्रवंशीय कायस्थ
पागोटें ब्राह्मण घालूं लागले
म्हणून पेशवाईच्या अमदानीत त्याला ब्राह्मणी पागोटे ही संज्ञा मुद्दाम देण्यांत आली. "त्यापूर्वी ब्राह्मणांच्या डोक्यावर असल्याचा इतिहास कोठे सापडत नाहीं, भवभूति कालीदासापासून तों चालू रामराज्यवियोग नाटकांपर्यंत जरी पाहिले तरी त्यांतहि रंगभूमीवर येणार ब्राह्मण पागोटें घालून येत नाहीं. वसई प्रांतातील दूधवाले आणि भाजीवाले जी तांबड्या बनातीची कानटोपी घालतात तेच ब्राह्मणांचे शिरस्त्राण आहे. नेहमी व्यवहारांत पगडी घालणारे कै. वामनराव जोशी पुनर्विवाहादि मंगल कार्यात पुरोहिताचे काम करण्याच्या वेळी पगडी बाजूला ठेवून बनातीची तांबडी टोपी धारण करीत असत, हे आम्ही स्वतः पाहिलें आहे. अधूनपर्यंतहि ब्राह्मणवृत्ति चालविणारे ब्राह्मण पागोटें घालून वृत्ति चालविण्यास बसत नाहींत.
आतांचे ब्राम्हण म्हणविणारे लोक पागोटी घालोत, फेटे घालोत, टोप्या घालोत, नाहींतर शिपतरे घालोत, या प्रश्नाकडे लक्ष देण्याचे कारण नाहीं. वाटेल त्यानें वाटेल तो ड्रेस करावा. त्याबद्दल कोणी कोणाची स्तुतीहि करीत नाहीं आणिनिंदाही करीत नाही. पण इतिहास पाहिला तर ब्राह्मणांना पागोट्याची मालकी सिद्ध करतांना नवीन विश्वामित्री ऐतिहासिक कागदपत्रे शेकोटीच्या धुरावर बनविल्याशिवाय मात्र गत्यंतर दिसत नाहीं.
कायस्थ प्रभू समाजाचा २० व्या शतकांत उद्धार करण्यासाठी राजवाडचानी मंडळामार्फत जे परशुरामास्त्र सोडले, त्याचा अखेरचा निर्णयी तडाखा ते असा देतात :--
`आतांपर्यंत कायस्थांच्या मागण्यांना विरोध करण्यात, ब्राह्मणांना अशी भीति वाटत असे की कायस्थांची एकेक मागणी पुरवितां पुरवितां त्या मागणीची सीमा ब्राह्मणपणाचा हक्क मागण्यापर्यंत जाईल. ती सीमा गाठण्याचा काल कधीच येऊ नये, एतदर्थ कायस्थांच्या पहिल्या अल्पस्वरूप मागण्यांनाहि त्यांनी प्रतिरोध केला. त्या प्रतिरोधांत ब्राह्मण क्षत्रियांच्या राज्याचा विध्वंस झाला आणि दंडधारी राज्यसत्तेच्या पाठिव्याने जे धर्मशासन शक्य व्हावयाचे ते धर्मशासनहि हातचे निघून गेलें. आतां अशी विचित्र स्थिति ओढवली आहे की, कायस्थांच्या ह्या हक्काच्या मागण्या पुरवावयाच्या त्या कोणत्या संस्थेने २. पू. ४७/४८. केवढा भयंकर प्रसंग हा! स्वराज्याच्या चळवळी, हिंदुसंघटनाच्या चळवळी, अस्पृश्योद्धाराच्या चळवळी, वगैरे शेकडों चळवळी करणाऱ्यांचे या भयंकर प्रसंगाकडे आजपर्यंत कसें लक्ष गेलें नाही? एवढे मोठे टिळक लोकमान्य झाले! त्यांची बुद्धि म्हणे शतपैलू वाटेल त्या विषयांत त्यांचा प्रभाव नाना फडणीस उडत्या पांखराची पिसे मोजीत असे! पण टिळकांची दृष्टीगोचरता इतकी सर्वगामी की ते म्हणे नसत्या पांखराची पिसेसुद्धा बिनचूक सांगत! पण त्यांना सुद्धा कायस्थ प्रभूच्या अस्तित्वामुळे हिंदुस्थानावर हिंदुसमाजावर हिंदुधर्मावर नव्हे हिंदुत्वावर ओढवलेल्या या भयंकर प्रसंगांचा वास सुद्धां येऊ नये? कशाला असल्या माणसाचे पुतळे उभारता? दर मंगळवारी इंग्रजांच्या कुटील नीतीची सालपटें सोलण्यात ४५ वर्षे खर्ची घालणाऱ्या केसरीला अगदी आपल्या पाठीजवळचे स्वराज्य व स्वधर्मविध्वंसक कायस्थ प्रभू दिसू नयेत? केसरी आंधळा व मुर्ख बनला तर बनला बोलून चालून तो हिन्दूच. पण केवळ गुप्तपोलीसांच्या जिवावर आपले राज्यशकट बिनधोक हांकणाऱ्या आणि पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पाण्याच्या वासावर नासिकच्या गोदेंतले गुप्त कट हुडकून काढणाऱ्या इंग्रेज राज्यकर्त्यांनाहि या विश्वातघातकी व साम्राज्यविध्वंसक कायस्थप्रभूंचा कायम बंदोबस्त करण्याची बुद्धि होऊ नये, हा काय आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ आहे?
कायस्थांच्या बदनामीनें ब्राह्मणांच्या श्रेष्ठपणाला रंग चढविण्यांत राजवाडे आपल्या जातीला आकाशापेक्षाहि उंच उचलून घरीत आहेत. कायस्थ प्रभूंवर ब्राह्मण्यप्राप्तीचा आरोप करणाऱ्या या शहाण्या समाजशास्त्र्याचा कान पकडून आम्ही सांगतो की वेळीं कायस्थ प्रभू स्वर्गाऐवजी नरकाला पसंत करतील, पण ब्राह्मणांच्या ब्राह्मण्याच्या सावलीला शंभर योजने दूर ठेवतील. ब्राह्मणांच्या ब्राह्मण्यांत असें काय मोठे दिव्य तेज आहे की पूर्वीच्या किंवा आतांच्या कायस्थांनी त्याच्या प्राप्तीसाठी जीव टाकावा? असाध्य व अनिवार्य रक्तपितीप्रमाणें ब्राह्मणांच्या नशिबीं आलेले ब्राह्मण्य खुशाल त्यांना पुढील हजार जन्म लखलाभ असो! हिंदुस्थानांतला एकहि ब्राह्मणेतर हिंदु या पितीवर आजपर्यंत प्यार झाला नाहीं, आज होत नाही. पुढे होणार नाही. कै. रामशास्त्री भागवत ‘आपल्या मराठ्यांचे चार उद्गार` या प्रसिद्ध ग्रंथांत म्हणतात (पृ. ११०-१११) “हल्लीच्या काळी म्हणजे जो उठला तो ब्राह्मण होऊ पाहतो. अशा काळीहि परतु (प्रभु) लोकांचा मगज न फाटतो स्थिर राहिला आहे. हे विशेष अभिनंदनीय होय......जर परबू (प्रभु) मध्ये कालज्ञता नसती, तर सगळे महाराष्ट्रमंडळ हिशोबाच्या संबंधाने ब्राह्मणमय होऊन जाते. पण परंतु (प्रभु) लोक मूळचे लेखक असून कालज्ञ पडले त्यामुळे ब्राह्मणांचा पगडा महाराष्ट्र देशांत सर्वच ठिकाणी पडला नाहीं.” आम्ही राजवाड्यांना व त्यांच्या घमेंडखोर मताच्या ब्राह्मणांना प्रतिज्ञानापूर्वक सांगतो की कोणत्याही काळचा कायस्थ प्रभू वाटेल ती शिवी वेळीं सहन करून शिवराळाला क्षमा करील, पण त्याला कोणी ब्राह्मण उपाधी चिकटवू म्हणेल तर तो त्याच्या नरडीचा घोट घेईल. कायस्थ प्रभूंच्या अल्पस्वल्प मागण्यांना ब्राह्मणांनी विरोध केला म्हणून ब्राह्मण क्षत्रियांच्या राज्याचा विध्वंस झाला काय? आणि त्यामुळेच हिंदूंच्या धर्मशासन संस्थाची होळी झाली आहे? मोठी आश्चर्याची गोष्ट आहे! मूठभर कायस्थप्रभूंनी एवढा विध्वंस करावा, ब्राह्मणक्षत्रियांची राज्ये धुळीस मिळवावी धर्मसत्तेला जिवंत गाडावी, आणि वीस कोटी हिन्दूनी, विशेषतः शापादपि शरादपि ब्राह्मणांनी त्यांच्यापुढे नामोहरम व्हावे, हा प्रकार काय दर्शवितो? एक राजवाड्यांचे हे विधान पुणेरी भांबट्याची गप्प तरी असले पाहिजे, किंवा कायस्थेतर ब्राह्मण क्षत्रिय हे सारे नामर्द षंढ तरी असले पाहिजेत, याशिवाय तिसरे विधानच निघत नाही. कायस्थांच्या बदनामींवर ब्राह्मण्यांचे फाजील स्तोम उभारतांना आपण सर्व ब्राह्मणांना बेवकूफ हिजडे बनवीत आहोत याची राजवाड्याना शुद्धच राहिली नाहीं. बहुसंख्य ब्राह्मणांना नामर्द व नेभळट बनविणाऱ्या ब्राह्मण्यासाठी कोण बेअक्कल माथेफिरू जीव टाकीत असतील ते खुशाल टाकोत! धर्मशासनाचा पाठिंबा गेल्यामुळे उद्या सर्व ब्राह्मण व त्यांचे ब्राह्मण्य मोडक्या बाजारांत लिलावास निघाले तरी एकहि अस्सल बीजाचा कायस्थ त्याकडे ढुंकून पहाणार नाही. हिंदु समाजस्थैर्याबद्दल मोठा डूड्ढाचार्याचा आव आणून हिंदूजनांनी व विशेषतः ब्राह्मणांनी या कायरथांचा बीमोड करण्याची चळवळ प्रथम हातांत घ्यावी. हें ठासून सुचविण्यासाठी राजवाडे आपल्या दीपाची आरती करतांना म्हणतात : “कायस्थांची जातिधर्मोन्नति करण्याच्या कामांत तडजोड न झाल्यामुळे स्वराज्यास आपण मुकलों. आतां एकवर्णाच्या वावटळीत समंजसपणे वाट न काढली, तर आपण हिंदुसमाजासहि गमावून बसूं."
कोणत्याहि समाजाला किंवा व्यक्तीला नामोहरम करण्याचे मार्ग दोन, एक, त्याचा लौकिक दर्जाहीन ठरविणे सर्वच बाबतींत बहुसंख्य ब्राह्मणांना चारीमुंड्या चीत करणाऱ्या अल्पसंख्य राजकारणी कायस्थ प्रभूंचा शारिरीक विध्वंस करणे ही गोष्ट ब्राह्मणांना केव्हांहि शक्य झाली नाही. उरला मार्ग लीटिकी बदनामीचा तो बोळण्यांत मात्र त्यांनी मुळीच कसर केली नाहीं. ग्रामण्यांचे हेतु हेच. क्षत्रिय मराठ्यांना शुद्ध ठरविलें आणि कायस्थ प्रभूंना शूद्राधम बनविले, की पेशव्यांचे व चित्पावनांचे राजकीय व सामाजिक महत्व थरारलेंच. या एकाच हेतुनी छत्रपति व कायस्थ प्रभू यांचा पेशव्यांनी छळ केला. राजवाड्यांच्या प्रस्तुत उपक्रमाचाहि मूळ उद्देश तोच. स्वराज्याचे व स्वधर्माचे तळपट कायस्थ प्रभूमुळेच उडालें, हे लोक मोठे विश्वासघातकी व साम्राज्यद्रोही आहेत, यांची बीजोत्पत्तिः क्षुद्र व संशयित आहे आणि या पुढे ब्राह्मणादि कायस्थेतर हिंदु समंजसपणे या कायस्थांना कायमचा चाट व पक्का काट न देतील तर हां हां म्हणता अखिल हिंदु समाजाचेच तळपट उडण्याचा भयंकर प्रसंग अगदी माथ्यावर येऊन भिडला आहे.
ही राजवाडी मल्लीनाथी शेंकडों विवेकी चित्पावन बंधु व चित्पावनंतर अखिल हिंदुना तर राज्य होणार नाहींच नाही. मग असले भयंकर आरोप निपूटपणे सहन करणारे कायस्थ प्रभू आज खरोखरच अकरमाशे व हिजडे बनले आहेत, असे कोणी म्हटल्यास त्यात वावगे काय? वर्तमान हिंदु संघटनाच्या व स्वराज्यप्राप्तीच्या चळवळीच्या काळी कायस्थ प्रभुसमाजावर विश्वासघाताचा व स्वराज्यद्रोहाचा जाहीर आरोप करण्यास भारत इतिहास संशोधक मंडळाने पुढाकार घ्यावा आणि या विषयी कायस्थांत भयंकर खळबळ उडाली असतांहि केसरी सांप्रदाईक पत्रकारांनी मूग गिळून बसावे, यावरून या सर्व स्वराज्य-पुराणिकांची या कायस्थ-बदनामीला पूर्ण संमति आहे, असाच निष्कर्ष निघतो. चित्पावनांच्या स्वराज्याच्या चळवळी म्हणजे
ब्राह्मणभोजनांतल्या खरकट्या पत्रावळी
असे आम्ही जे नेहमी म्हणतों त्याचा हा प्रत्यक्ष पुरावा ब्राह्मणेतरांनीं पाहून घ्यावा. कायस्थ प्रभु सार्वजनिक कार्यात भागच घेत नाही म्हणून कधिमधी कुरबूर करणाऱ्या चित्पावन स्वराज्यवाद्यानी वास्तवीक असा विचार करावयास पाहिजे की एकजात कायस्थांना तुम्ही विश्वासघातकी व स्वराज्य बुडवे ठरविल्यानंतर तुमच्याशी त्यांनी कोणत्या मुद्यावर सहकारिता करावी? केवळ वैयक्तिक धडाडीने राजकारणांत, समाजकारणात किंवा जनसेवेच्या इतर रंगणात यथामति कार्य कयणान्या कायस्थ प्रभूबद्दल तरी या देवजी धसाड्यांनी आजपर्यंत काय पुरस्काय केला आहे व कितीशी सहानुभूति दाखविली आहे? कायस्थ मरोत, इतर जनसेवक ब्राह्मणेतरांबद्दल तरी या चाणक्यांना कोठे प्रेम वाटतें? ब्राह्मणेतर बहुजनसमाजा (masses) बद्दल परिश्रम करणारे कै. शाहू छत्रपति ज्यांना स्वराज्यद्रोही छत्रपति वाटावे त्यांनी कायस्थ प्रभूवर वाटेल ते घाणेरडे आरोप केल्यास नवल नाहीं. प्रस्तुत वादासंबंधानें प्रोफेसर जदुनाथ सरकार यांनी ‘मॉडर्न रिव्यू ‘ मासिकांत मंडळाची नुकतीच झाडाझडती घेतली. त्याला उत्तर देतांना श्री. दत्तो वामन पोतदार यांनी टणत्काराच्या दणक्याला उद्देशून म्हटलें आहे की. “ठाकरे यांनी शिवराळ (abusive) वाङ्मयाची दांडगी चळवळ सुरू केली.” श्री. पोतदार हे बी. ए. असले तरी भाषाविषयांत किंवा इतिहास संशोधनांत मीच काय तो मोठा शहाणा अशी त्यांनी वृथा घमेंड मारूं नये. अॅब्यूजिव (शिवराळ भाषा कोणती व कोणती सभ्य, हे ठरविणारे विद्वान हिंदुस्थानांत पुष्कळ आहेत. ठाकऱ्यांचा टणत्कार या पंडिताला `अॅब्यूजिव ` वाटावा, पण राजवाड्यांचा उपद्व्याप स्वतःच्या नावाने प्रसिद्ध करतांना डिफेमेटरी `स्कॅन्डलस किंवा मिश्चीवस` वाटू नये, हें पोतदारांचे भाषाशास्त्रप्राविण्य, विधानकौशल्य, का कऱ्हाड्या - मनांत पडलेली चित्पावनी फोडणी? सभ्यतेच्या गाळीव अर्कानो, इतिहाससंशोधनाच्या ढोंगानें कायस्थांच्या बीज क्षेत्रशुद्धीची नालस्ती करता, धडधडीत खोट्या व खोडसाळ पुराव्यावर त्यांना विश्वासघातकी म्हणता आणि मराठी स्वराज्य कायस्थ प्रभूनीष बुडविलें म्हणून ठासून जाहीर करता. हीं तुमची संशोधकी कारस्थानें `अॅब्यूजिव शिवराळ की ठाकऱ्यांनीं प्रत्युत्तरादाखल हाणलेली जोडेपैजार शिवराळ?
असे तर कांरे
म्हणणे केव्हांहि सरळच असतें. परंतु अरे म्हणणारानेच जर आपल्या जिमेला इतकी सैल सोडली नहीं. तर दुसऱ्यालाहि कारे म्हणण्याची पाळी येत नाहीं. इतिहास संशोधनाच्या नावाखाली जुनी जातीविशिष्ट मत्सरांची पुनरावृत्ति केल्यानें स्वज्ञातीचा इतिहास अधिक उज्वल होईल, किंवा इतर जातीतील ऐतिहासिक नरनारींच्या चरित्र्यांवर आणि चारित्र्यांवर काजळ फासल्यानें आपल्या विशिष्ट ज्ञातीच्या ऐतिहासिक पुरुषांची चरित्रे व चारित्र्ये अधिक उठावदार होतील, अशी अपेक्षा करणे, समंजसपणाचे तर होणार नाहीच, पण उलट त्या कृत्यानें संशोधकांच्या संशोधन तपः चर्येवरच काजळ फासलं जाण्याचा संभव फार, हाच प्रसंग राजवाडे यांनी भा.इ.सं.मं. वर आणला आहे.
अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांतील चित्पावन समाजाचा धार्मिक, सामाजिक आणि राजकीय वर्तनाचा जो इतहास प्रसिद्ध आहे. ज्यावरून चालू मन्वंतरांतसुद्धां जी कित्येक बिनतोड प्रमेये ठरविण्यांत आलेली आहेत, आणि तद्विषयक सरकारी दप्तरांपासून तो कालच्या रौलटकमिटीच्या रिपोर्टापर्यंत एकजात एकच स्वरांत नमूद केली आहेत. ती सर्व चित्पावन समाजांतील प्रत्येक व्यक्तीस एकसारखी लागू करणे, केव्हाहि न्याय्य होणार नाहीं.
संस्कृतीच्या बाबतीत चित्पावन समाजाने गेल्या दीडशे वर्षात जी भरारी मारली आहे. तीमुळे त्यांच्यात सुद्धा विद्वान्, विचाररक्षम, तत्वज्ञ आणि समभावना राखणारे महानुभाव बरेच दृष्टीस पडतात. परंतु एकंदर समाजाच्या व्याप्तीच्या मानानें असल्या महात्म्यांची संख्या अत्यंत अल्पतम (मायक्रॉस्कोपिक मायनॉरिटी) आहे. म्हणनूच ज्याप्रमाणे एका दुर्योधन व्यक्तीमुळे कौरवपांडवांच्या अठरा अक्षौहिणी सैन्याचा निष्कारण फडशा उडाला, त्याचप्रमाणे अल्पसंख्यांक परंतु बेजबाबदार चित्पावन व्यक्तीच्या कृष्णकृत्यामुळे संबंध समाजालाच काळोखी लागण्याचे प्रसंग वरचेवर यावेत. ही गोष्ट विशेष चिंतनीय आहे. देशबांधव या नात्यानें आम्हांला चित्पावन समाजाच्या संस्कृत्यांबद्दल आनंद वाटणे आणि दुष्कृत्यांबद्दल खेद होणे हे अगदी साहजिकच आहे; परंतु त्यांची प्रवृत्ति त्यांच्या ऐतिहासिक कारस्थानी परंपरेकडे जेव्हा आतांप्रमाणेच कधी कधी वळून मार्गे पहाते, तेव्हां त्या त्या बेजबाबदार व्यक्तिला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्यकर्म आहे. ते आम्ही प्रामाणिकपणाने बजावीत असतां कोणास एकदा जणादुणा शब्द निरूपणाच्या आवेशांत आमच्या लेखणीतून पडला असल्यास तो दोष आमचा नसून वाग्युद्वाचा आहे, हि सांगितल असे नहीं.
स्वतःच्या व स्वज्ञातियांच्या दृष्कृत्यांचा ब्राह्मणांना कधीच किळस येत नाही, त्यांची ब्रह्मयात्युत्पत्याची घमेंड असून पुरी जिरलेली नाही. स्वतः चे दोष दुसऱ्यांच्या माथी थापण्याची त्यांची खुमखुम अझून बंद पडलेली नाहीं. महाराष्ट्रीय ब्राह्मणेतर ज्ञातीत कायस्थ प्रभु ही एकटीच (चौकशी बोलकी असे म्हणतांच कां चा जबाब देणारी) `कम्युनिटी आहे. के. शाहू छत्रपतींच्या `लोकशाही चळचळीत` मुळें ब्राम्हणेतर नांवाखाली मराठ्यांत मुमुसकीच्या हक्काची जाणीव होऊन त्याना अलीकडे याचा फुटली आहे. तरी आजपर्यंत अखिल ब्राम्हणेतर ज्ञातींच्या "आर्टिक्युलेट”पणांचे प्रतिनिधित्व कायस्थ प्रभूनींच इमानाने बजावलेलें आहे. असल्या कायस्थाविषयी मराठ्यांचे व इतर ब्रह्मणेतरांचे मन बिथरून त्यांत वैमन्यस्य पाडल्याशिवाय, चित्पावनादि राष्ट्रीय ब्राह्मणांना त्यांच्यावर कुरघोडी चढवितांच येणें शक्य नाहीं, हाच ब्रह्म ब्राम्हणांच्या सर्व चवळीचा गुप्त हेतु आहे. कै. शाहू छत्रपति एकदा प्रस्तुत लेखकाला म्हणाले "ऑ.गोखले मोठे पेट्रियट खरे पण मला ते एकदा पुण्याच्या स्टेशनवर भेटले असतांना मी माझ्या चळवळीची दिशा त्यांना सांगितली. बहुजनसमाजजागृतीचे तत्व अक्षरशः मान्य करून ते मला किंचित् ठासून म्हणाले की हा प्रयत्न करताना ब्राम्हणांसारख्या जागृत समाजाला डिवचण्याचा यत्न करू नका. Don`t try to tease the articulate community like the Brahmins. सारांश, ठाकरे, टिळक झाले काय किंवा गोखले झाले काय, सर्वांच्या पेट्रिऑटिझममध्ये ब्राम्हणी वर्चस्वाचा एक रिझर्व कंपार्टमेंट आहे. त्याला कोणी हात लावू नका म्हणतात. ब्राम्हणांनी आपल्या वर्चस्याचा टेंभा मिरविण्याचे सोडल्याशिवाय किंवा ब्राम्हणेतरांनीच ब्राम्हणांना दूर झुगारून दिल्याशिवाय ब्राम्हणेतरांना आत्मोद्धाराचा मार्ग कसा चोखळता येईल. हे मला समजत नाही, कितीहि केले तरी ब्राम्हण अखेर आपल्या जातीवरच जातो. याचे मी प्रत्यक्ष अनुभवाचे लाख दाखले देईन. मग ठाकरे साहेब, तुमचे मत काहीहि असो." सदसद्विवेक बुद्धीला न ठकवितां प्रत्यक्ष अनुभवच सांगायचा तर गेल्या १५-२० वर्षांतील आमच्या जनसंपर्काचा परिणाम पाहिला तर के. शाहू छत्रपतीचे उद्गार बहुतांशी खरे आहेत, यात संशय नाही, सामान्य नियमाला अपवाद असतात, हें तत्व पूर्ण ध्यानात ठेवून, असे म्हणावयास हरकत नाही की, ब्राम्हण मग तो चित्पावन असो, यजुर्वेदी असो, किंवा कोणिहि असो त्याच्या आपमतलबाला किंचितही धक्का लागण्याची वेळ आली की, तो सर्व देशबंधुपणाचे नाते विसरून ब्राह्मणातरांवर सापाप्रमाणे उलटण्यास कमी करणार नाही.
सावकारीत मारवाडी पत्करला पण ब्राह्मण सावकार पत्करत नाही व्यापारात गुजराथी, भाट्ये, मेमन, मुसलमान, पार्शी व्यापाऱ्यांशी सरळ केलेली चढाओढ त्याच्या अभिनंदनास पात्र होते. पण ब्राह्मण व्यापारी भेटला तर तो वेळी आपलें नाक कापून दुसऱ्या ब्राह्मणेतर व्यापाऱ्यांना अपशकून करायला किंवा शक्य तर त्या खाली पाडायला मुळींच कसर करणार नाही. वाङ्मय क्षेत्रांतहि ब्राह्मणी दुष्टी बुद्धीचे परिणाम प्रत्येही अनुभवास येत असतात. तात्पर्य, एकीकडे सार्वजनिकपणाच्या, देशबंधुत्वाच्या किंवा स्वराज्याच्या ब्राह्मणी पुराणांना केवढाहि ऊत आलेला दिसला, तरी अखिल ब्राह्मणेतर जनतेवर आपली निरंतरची कुरघोडी कायम ठेवण्याचा ब्राह्मणांचा गुप्त हेतु त्यांच्या काळापासून कधीच निराळा होत नाही, अर्थात स्वराज्याच्या मार्गात कायस्थ प्रभूंच्या जातिधर्मोन्नतीच्या विरोधाची किंवा त्यांच्या वेदोक्त पुराणोक्त्ताची धोंड आडवी पडलेली नसून, ब्राह्मणांच्या शिरजोरपणाचा व विलक्षण कारस्थानी मनोवृत्तीची धोंड प्रत्यही अडथळे उत्पन्न करीत आहे. आजचे राजकारण शूद्र भिक्षुकी आहे. आचारी पाणक्यांना देशभक्त आणि माथेफिरू पिसाटांना महर्षि किंवा सेनापति बनविणाऱ्या या राजकारणाच्या धांगडधिंग्यांत महात्मा गांधीसारखा लोकोत्तर संन्याशीहि वैतागून गेला. मग इतरांची काय क्षिति? राजवाड्यांचा उपद्व्याप वरवर पहाणाराला वैयक्तिक दिसेल, एका कायस्थ ज्ञातीपुरता संकुचित वाटेल, किंवा त्यांचे महत्व दिवाणखानी गप्पांपुरतें अगर वर्तमानपत्री नियमित भासेल. परंतु हें एक अति व्यापक डावपेचांचे सामुदायिक पाठबळांचे भयंकर भिक्षुकी कारस्थान आहे. एवढे ब्रह्मणेतर जनतेला जर नीट पठेल तर ब्राह्मणांच्या नानाविध डोग धतुऱ्यांना बळी पडणाऱ्यांची संख्या पुष्कळच कमी होईलच, अशी आशा आहे.
युद्ध-मग ते प्रत्यक्ष समरांगणातील असो किंवा वाग्युद्ध असो ते वाईटच. ते सुरु असतांना प्रतिपक्षियावर सोडलेले बाण प्रथम जरी युद्धाच्या आवशात बेगुमानपणाने आणि कठोर अत:करणाने सोडलेले असतात. तरी युद्धाची किंवा चकमकीची परिसमाप्ती होऊन सैन्य आणि सेनानी शिबिराकडे परतू लागले म्हणचे युद्धकाली घडलेल्या अत्याचाराबद्दल प्रत्येक योद्ध्यास वाईट वाटल्याशिवाय रहातच नाहीं हा मनुष्य-धर्मच आहे. भा. इ. स. म. ने सध्याच्या अत्यंत नाजुक परिस्थितीतच चां. का. प्रभू समाजावर अत्यंत घाणेरडे आरोप करण्यास पुढे व्हावे आणि त्या आरोपांचा प्रतिकार करण्यासाठी आम्हालाहि आमचें कोदंड सज्ज करणे भाग पाडावे ही गोष्ट अत्यंत शोधजनक भासत आहे. भगवान श्रीकृष्ण त्याना सुबुद्धि देवो ।
ॐ शांतिः शांतिः शांतिः
****
परिशिष्ट
मराठ्यांचा इतिहास फांसावर चढला
[प्रबोधन १६ / ८ / २२]
स्वराज्याच्या राष्ट्रप्रेमाच्या व स्वातंत्र्यांच्या पुराणांना हल्ली कितीहि कढ आलेला असला आणि त्या कढांत बऱ्याचशा विवेकभ्रष्ट ब्राह्मणांच्या आदरयुक्त प्रेमाचा कढ जरी आटोकाट येत असला, तरी ब्राह्मणेतरांवर आपली कुरघोडी सनातन चिरंजीव करण्याच्या धडपडी ब्राह्मणानी, विशेषतः राष्ट्रीय चित्पावनांनी चालू क्षणापर्यंत अव्याहत चालविलेल्या आहेत. या त्यांच्या खटपटी कुशाग्र विद्वत्तेच्या पांघरूणाखाली वाटेल तसल्या कारस्थानांची अंडी उबवीत असतात. राष्ट्रीय चित्पावनांचे डावपेच आता पुष्कळ चित्पावनेतरांच्या व अनेक विवेकी चित्पावनांच्या ध्यानांत आल्यामुळे ते सहसा यांच्या तोंडून कोसळणाऱ्या अद्वैत गटारगंगेच्या लोंढ्यापासून बरेच दूर असतात हे जरी खरे आहे तरी त्या गंगेच्या पंचनी पडून राष्ट्रीय चित्पावनांच्या पायातल्या पायतणाचा मान मिळविण्यासाठी घाघावलेले शेकडो शिखंडी आज ब्राह्मणेतरांत सांपडणे अशक्य नाही.
एकट्या चित्पावनांबद्दल किंवा सर्रास ब्राह्मणाबद्दल जरा कोठे कोणी निषेधाचा ब्र काढला की ही अजागळ शिखंडीची जबकसेना लगेच कोल्हेकुई करावयास लागते की हा शुद्ध जातिद्वेष! पण या विवेकशून्य महामूर्खाना असून हे उमजत नाही की ब्राह्मण बाह्मणेतरातील कोणताहि तंटा घेतला तरी त्यांत पहिली आगळीक राष्ट्रीय चित्पावनांचीच असते. त्यांनी ` अरे म्हणताच कारे` चा प्रतिध्वनि न काढण्याइतके ब्राह्मणेतर आजच काही षंढ झाले नाहीत. ऑफेन्सिवचे पातक राष्ट्रीय चित्पावनांनी केल्याशिवाय ब्राह्मणेतरांनी डिफेन्सिवची सणसणीत खेटरे त्याना कधीही हाणलेली नाहीत, हे आम्ही सप्रमाण पुराव्याने वाटेल तसे सिद्ध करून द्यायला तयार आहोत. चार पांच वर्षांपूर्वीचा कायस्थ प्रभू विरूद्ध भारत इतिहास संशोधन मंडळ हा वाद घ्या किंवा सध्या सुरू असलेला चित्पावन बोडस विरुद्ध भंडारी समाज वाद घ्या. यांत पहिली आगळीक कोणाची?
हे चित्पावनांच्या पायातले पायपोस बनलेल्या व घरांत चुलीपाशी बसून अभेदभावाच्या कहाण्या कुजबुजणाऱ्या नामर्द षंढानी का विचारांत घेऊ नये? भा. इ. से. मंडळाने राजवाड्यांच्या हस्ते कायस्थ प्रभूंना `नीच बीजाचे, उलट्या काळजाचे, मराठी साम्राज्याला आग लावणारे वगैरे ठरविण्याचा पद्धतशीर दस्तऐवजी हलकटपणा केला नसता तर आम्हालाहि कडकडीत टीकेचा तडाखा मंडळाला भडकविण्याची काय जरूर होती? परंतु आमच्या कोदण्डाचा टणत्कार होतांच "एकानें गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू कशाला मारावें?” असा आम्हांला साळसूदपणाचा उपदेश करायला पुष्कळ नीच बीजाचे, उलट्या काळजाचे, साम्रज्यद्रोही कायस्थन शिखंडी पुढे आले होते. याच हरामखोराच्या पगडीशिलेदारपणामुळे मंडळाला अखेरचा पट्ट्याचा हात दाखविण्याचे कार्य ठार झाले आणि कायस्थांच्या साम्रज्यद्रोहाचा पुणेरी चित्पावन ताम्रपट आचंद्रार्क त्यांच्या उरावर थै थै नाचायला जिवंत राहिला.
सध्यां चित्पावन बोडसाने पेटवून दिलेलें भंडाऱ्यांच्या अस्पृश्यत्वाचे कारस्थान पाहिले तरी त्यांतहि आगळीक किंवा ऑफेन्सिवचा दोष चित्पावनांकडेच आहे. हे सर्वांनी नीट लक्षांत ठेवावे. हे प्रकरण एवढे भयंकर माजलें असतांहि राष्ट्रीय पत्रांत त्याचा नुसता नामनिर्देशहि होत नाही, याचा ब्राह्मणेतरांतील चित्पावनी पायतणावर काहीच का उजेड पडू नये?
एका तत्त्ववेत्त्याने कोठेसे लिहिल्याचे स्मरते की You kill the history and yo kill the man" इतिहास ठार करा की माणूस मेला इतिहास हे राष्ट्राचे जीवन आहे. समाजाचा प्राण आहे. हा प्राण ठेचला की काम झाले. यासाठीच जेते लोक प्रथम जित लोकांच्या इतिहासाचा बालेकिल्ला जमीनदोस्त करतात ब्राह्मणेतरांना कवडीमोल ठरविण्याची राष्ट्रीय कामगिरी प्रथम भारत इ. स. मंडळाने आपल्या हाती घेण्याचा उपक्रम केला पण त्या कामी त्याना हातपाय पोळून घेण्याचा अनवस्था प्रसाद लाभल्यामुळे त्यांनी सध्या तरी या दिग्विजय संपादनाच्या मार्गाचा संन्यास केलेला दिसतो. संन्याशाला रोडी फुटणार नाही असे नाही सामुदायिक प्रयत्नाला परशुराम यथास्थित न फळल्यामुळे आता राष्ट्रीय चित्पावनानी व्यक्तिशः तुरळक हल्ले चढवून ब्राह्मणेतरांच्या इतिहासाचा मुर्दा पाडण्याच्या खटपटी चालू ठेविल्या आहेत. या कामी पुण्याच्या पुण्याईचे मुंबईकर, धुळेकर, मिरजकर व ठाणेकर अभिमानी रात्रदिवस राष्ट्रीय खस्ता खात आहेत. अस्पृश्योद्वाराच्या बलाना चालल्या असताना, भंडारी बांधवांना धेडा मांगांच्या पंक्तीला बसविण्याचा बोडसाचा प्रयत्न आणि आता ठाण्याच्या तर्कपाळीवर विद्वत्तेच्या खांबाला मराठी दप्तराच्या दुसऱ्या रुमालाच्या सरगाठीत मराठ्यांच्या इतिहासाला फासावर चढविण्याची श्री. विनायक लक्ष्मण भावे यांची कामगिरी याच खस्तांचे द्योतक आहे.
मराठेशाहीचा इतिहास सामान्यतः कितीही उज्वल असला, कितीही अभिमानास्पद असला व कितीहि वर्णनीय असला, तरी त्यात चित्पावन पेशव्यांच्या सैतानशाहीची काळीकुट्ट डांबर नखशिखांत भरलेली आहे. हे शल्य चित्पावनांना रात्रदिवस सलत रहावे, यात निसर्ग विरूद्ध असे कांही तेव्हा. एनकेन प्रकारेण हा इतिहास उलटसुलटा कसा करता येईल, पेशव्यांच्या तोंडाची काजळी ब्राह्मणेतरांच्या बापजाद्यांच्या थोबाडावर बेमालूम कशी उसवता येईल आणि सर्रास चित्पावनांच्या बोकांडी इतिहास पुराणदि ग्रंथानी लटकविलेली क्षुद्रोत्पत्तीची धारेपड चित्पावनेतराच्या गळ्यात कशी गपचूप घालता येईल, यावर अनेक विचित्रवीर्य चित्पावन पंडितांच्या अकला अलीकडे भवतिनभवतीचे घाणे हांकीत असतात.
याविषयी सर्व महाराष्ट्रीयांना जाहीर स्पष्टोक्तीचा इषारा देताना सन १९१९ सालात प्रसिद्ध झालेल्या आमच्या ग्रामण्यांचा साद्यंत इतहिास या ग्रंथात असे उद्गार काढले होते, की "सध्या ऐतिहासिक व्यक्त्याच्या बाप्तिस्मांचा धुमाकूळ सुरू झाला आहे. सावित्रीबाई ठाणेदारणीला कोणी कायस्थ प्रभू ज्ञातीतून चित्पावन जातीत ढकलीत आहेत कोणी तिला कादंबरीतील नायिका म्हणत आहेत कोणी नाना फडणीसाच्या अंतःकरणाच्या खाणीतून कोहिनुरांचे ढीगच्या ढीग बाहेर काढीत आहेत, कोणी त्याच्या मनोमन भूमिकेवर नक्षीदार गालीचे पसरण्याच्या गडबडीत आहेत. कोणी गोपिनाथपंत बोकीलाला शिवाजीची चिटणीशी वतनी बहाल देण्याच्या धामधुमीत आहेत कोणी हेमाडपंतालाहि ब्राह्मणी पोषाख चढविण्याच्या तजविजीत आहेत; तर कोणी मराठ्या आठवल्याला चित्पावनी बाप्तिस्मा देण्याच्या खटपटीत आहेत. असा मोठा ऐतिहासिक क्रांतीचा काळ आलेला आहे. तेव्हा या भानगडीत काय काय उलाढाल्या होतील ते पाहिले पाहिजे न जाणो, उद्या अफझुलखान हा शिवाजीचा मामा ठरण्याचा बराच संभव आहे कारण कृष्णाने कंस मामाला ठार मारले म्हणून आणि मुरारबाजी हा चित्पावन असल्याचाहि दस्तऐवजी पुरावा सापडणार नाही कशावरून? हे आमचे उद्गार वाचून त्या वेळी दांत काढून हसणाऱ्यांनी आता भाव्याचा दुसरा रुमाल मुद्दा डोळे फाडून पहावा, असे आम्ही आवाहन देतो. अफझुलखान शिवाजीचा मामाचा काय, पण वागताच्या त्रिपाद पराक्रमाप्रमाणे आमच्या या दाणेदार लाखापतीचा मराठी दफ्तर प्रकाशनाच्या इजा बिजा आणि तिजा रुमालाचे पाऊल महाराष्ट्र इतिहास- सुंदरीच्या उरावर पडताच शिवाजी छत्रपति महाराज हे चित्पावन जातीचे ठरल्याशिवाय खास रहाणार नाहीत, अस भविष्य आह्मी आजच करून ठेवतो.
ठाणकर वामनाने आपल्या दुसऱ्या पावलांत बाळाजी आवजीला तर बेट पहिल्या नंबरचा पागल ठरविला आहे. छत्रपति सातारकरांना राष्ट्रद्रोही ठरवून, तत्कालीन शहाण्यांनी प्रतापसिंहासारख्या `हरामखोरा`ला सातारच्या माळावर एखाद्या झाडाला जिवंत उलटा टांगून कोल्ह्या कुत्र्यांकडून का फाढविला नाही, म्हणून त्यांच्या नांवाने कडकडा बोटे मोडली आहेत. प्रतापसिंहाचे साथीदार क्षत्रिय मराठे व कायस्थ प्रभू यांनीच इंग्रेजांशी घरभेद करून मराठी स्वराज्याचा प्राण घेतला, म्हणून या लाखापति भाव्यांनी त्या सर्व मेल्या मुडद्यांच्या खाका वर खेचून त्यांना ठाण्याच्या तळेपाळीवर `वन्समोर’ फाशी दिले आहे आणि विशेष राष्ट्रीयपणाची नवलाई म्हणजे वाचकहो, नीट शुद्धीवर येऊन ऐका! जगातले कितवें आश्चर्य कोणास कळे नीट शांतपणाने भाव्याची ही चालू चातुर्मासातली कहाणी ऐका-शेवटले रावबाजी हे मोठे धाडसी पराक्रमी राजकारणी व मराठ्यांच्या स्वराज्याकरिता अखेरपर्यंत आपल्या जिवाचें रान करणारे मोठे शूर तलवारबहादर मर्द होते काय म्हणता? विश्वास बसत नाही?
वाचकहो, भावे तुह्या आह्या सर्वांना मूर्ख ठरवून असे सांगतात की रावबाजी स्वतःच रणशूर रणनवरे होते. असे नाही तर त्यांची नवरी बायको-नको रावबाजीची पट्टराणी ही सुद्धा रणनवऱ्याची रणनवरी होती. त्या हरामखोर प्रतापसिंहाने मराठे व कायस्थ पागलांच्या नादी लागून महात्मा रावबाजीचा गळा जर कापला नसता, तर तर तर काय आज बहार झाली असती! पुण्याच्या माणकेश्वराचा तंबोरा आज ठाण्याच्या ठाणकेश्वर भाव्यांच्या हातांत आला असता बोलून घालून इतिहाससंशोधन ते. मग बाळाजी विश्वनाथाचा खापरपणजा शिवाजीमहाराजांच्या हाताखाली दरहजारी सुभेदार म्हणून का उपटू नये? आणि हवशाने जलसमाध दिलेला बाळाजीचा भाऊ जानवा भट खुद पुण्याचा सुभेदार असल्याचे सिद्ध को होऊ नये? अस्सल रक्ताच्या अस्सल चित्पावन इतिहाससंशोधकांच्या तावडीत सापडणारे कोणते दस्तऐवज आजपर्यंत कमअस्सल ठरले आहेत? एकहि नाही. भा. इ. सं. मंडळाच्या चतुर्थ संमेलनवृत्तांतला राजवाडचांचा दिग्विजयी कायस्थ दीपसुद्धा कमअस्सल ठरवून जिवंत कायस्थांना विझवितां आला नाहीं. बाकी कायस्थांत विद्वान् इतिहासज्ञांचा काही दुष्काळ पडला नाही हो. राजवाडे प्रकरणाच्या वेळी कायस्थांच्या घरोघरच्या मोलकरणीसुद्धां इतिहाससंशोधक बनल्या होत्या. पण अखेर काय? त्यांच्या बांगड्यांच्या कणकण किणकिण नादातच त्या प्रकरणाचे पर्यावसान होऊन राजवाड्यांच्या निबंधाची नथणी एकजात कायस्थ मर्दाच्या नाकांत चिरकालची जाऊन बसली ती बसलीच.
भाव्यांच्या दुसऱ्या रूमालाचे वारसे लावायला श्री. दत्तात्रय विष्णु आपट्यांच्या हाताला हात लावायलाहि एक कायस्थ पात्र श्री. भाव्यांना ठाण्याच्या तळेपाळीवर भटकतांना आढळले. हे पात्र म्हणजे प्रभुरत्नमाला प्रसवून कायस्थांच्या इतिहासाची पातळ भाजी करणारे व शिवदिग्विजय बखरीचा नैवेद्य बहादेकर भिक्षुक देवतेला दाखवून तिचे मांतरे करणारे राजमान्य राजेश्री सखाराम गणेश मुजुमदार हे ही पहिल्या रूमालाच्या वेळी असरहरू सर्टिफिकेटसाठी श्री यांनी असेच दोन तीन अजागळ कायस्थ निवडून काढले होते. या खेपेस त्यांना बडोदे संस्थानातील गडावरच्या या मुजुमदार गटकरी कायस्थ पात्राचा लाभ झाला अलभ्य लाभ म्हणायचा?
‘श्री भावांचा पहिला रुमाल` असाच अस्सल लेखणीच्या पोटी जन्माला आलेला आहे. यावेळी राष्ट्रीय पत्रकारांनी अतांच्या लोकमान्य कर्त्याप्रमाणे त्या मालाची तळी आकाशाला भिडे इतकी उंच उचलेली होती. त्यावेळी आम्ही या रुमालाबद्दल असा स्पष्ट अभिप्राय दिला की. "तीन अनभ्यस्त लेखकांनी पौराणिक पाटणीवर एक बखरवजा लिहिलेले मारू ठाणे येथील मराठी दप्तरांतील १ ला रुमाल म्हणून सन १९५० साली प्रसिद्ध झाले आहे. संशोधकांने व प्रकाशकाने या भारूडाचे महत्व प्रस्थापित करण्यासाठी सर्टिफिकेटचा वगैरे बराच फार्स केला आहे. परंतु हे भारूड म्हणजे निवळ ऐकीय ऐतिहासिक गप्पाचे एक अव्यवस्थित व अविश्वसनीय आहे. यांत ऐतिहासिक सत्यापेक्षा हरदासी गप्पांचा भरणा रगड आहे.” (ग्रामण्य पू. १३२ फूटनोट) पुष्कळांना हा आमचा अभिप्राय एरंडेलाप्रमाणे रेचकदाता वाटला व ठाणे पुणे येथील चारपाच कायस्थ चष्मापगडीघरांनी त्याबद्दल आपली कायस्थी नापसंती झिलमिला फलकावून व्यक्त केली. इतक्यात प्रो. जदुनाथ सरकारचा दंडूका या रूमालावर पडला.
शिवाजी आणि शिवकाल या इंग्रजी पुस्तकाच्या ५०२ पृष्ठावर प्रोफेसरांनी स्पष्ट नमूद केलें की " Utterly worthless expansion of Sabhasad with forged letters and imaginary details" [ चोपडे बनावट पत्रे आणि काल्पनिक मजकुराने भरलेले समासदी बखरीचे भरसाट वाढविलेले अत्यंत मिकार व कवडी किंमतीचे रूप आहे. ] सोनारानेच कान टोचल्यामुळे वरील पगडीधरांच्या एका कानावर कललेल्या पगडचा लगेच सरळ बसल्या की नाही, आम्हांस माहीत नाही.
श्री. भाव्यांचा हा चखोट ग्रंथ वाचून पेशवाई बुडाली असे म्हणणाऱ्या इसमाची ताबडतोब ठाण्याच्याच वेड्यांच्या आश्रमांत रवानगी करावी लागेल. हा महाग्रंथ ग्रंथकाराने भारत इ. सं. मंडळाच्या एका जबाबदार बैठकीत वाचल्याचे आम्हाला कळते. ही गोष्ट खरी असेल तर मंडळाने आपला अभिप्राय त्वरित प्रसिद्ध करावा, असा आमचा आग्रह आहे. हिन्दवी स्वराज्याचा खून कोणी पाडला, याचा भरपूर पुरावा महाराष्ट्रापुढे मांडण्यासाठी शंभर वर्षापूर्वीचे महाराष्ट्र हा ग्रंथ आम्ही लिहीत आहोत. त्यांत भाव्यांच्या रुमालाच्या चिंधड्या उडविण्याइतका दस्तऐवजी पुरावा व विवेचन येईलच इतिहासाचे क्षेत्र ब्राह्मणेतरांच्या गफलतीमुळे जरी राष्ट्रीय चित्पावनांनी सर केले असले, तरी त्यांच्या ऑफेन्सिवला डिफेन्सिवधी उलट सलामी न देण्याइतका ब्राह्मणेतर समाज काही निर्विर्य झाला नाही, किंवा ऐतिहासिक सत्याची निश्चिति चित्पावनांना हस्तगत झालेल्या चिठोऱ्यांवरच ठरण्याचा नाना फडणीशी मामला आज हयात नाही, हे त्यांनी पूर्ण लक्षात ठेवावे.
श्री. विनायक लक्ष्मण भावे यांचे विश्वामित्री इतिहास-संशोधन.
लोकाश्रयाच्या अभावी गतप्राण झालेल्या मराठी दप्तर संस्थेला स्वतःच्या हिमतीवर [ प्रबोधन १-९-१९२२ व १०-१०-२२ ] तशीच फरफटत ओढून तिच्या पोटी दुसऱ्या रूमालाची प्रसूति करणाऱ्या श्री भाव्यांच्या या नूतन अपत्याला हे करण्यापूर्वी त्यानी जुलै १९२२ च्या अंकात पृष्ठ २७८-७९ वर शिवाजीच्या कुळी चिकापुराण सागितले आहे. त्याचा आजच्या अंकी विचार करण्याचे योजिले आहे. प्रथम आम्ही मोकळ मनाने नमूद करून टाकतों की श्री भावे यांचा व आमचा (राजवाड्याप्रमाणेच) कोणत्याहि प्रकारचा वैरभाव नाही. त्यांच्या ग्रंथाशिवाय आमचा त्यांचा निकट परिचय झालेला नाही. फार काय पण आम्ही निदान या घटकेपर्यंत कोणीही परस्परास पाहिलेले नाही. तेव्हा चिकित्सेच्या काटेरी समरांगणावर वादविवादाच्या भरात एकादा कलमी वार जर झालाच, तर त्याच्याबद्दल कोणी कोणावर द्वेषबुद्धीचा आरोप करण्याला वास्तविक काही जागा नाही. श्री. भावे यांचा साहित्य व इतिहासविषयक उद्योग प्रशंसनीय आहे. त्यांचा नेपोलियन असून आमच्या हाती गवसला नसला, तरी त्याच्या महाराष्ट्र सारस्वत प्रथा रसास्वाद आम्ही अत्यंत आनंदाने एक दोन वेळा नव्हे. एकूण आठ वेळा लागोपाठ घेतलेला आहे. परंतु श्री भावे झाले काय किंवा राजवाडे झाले काय, ते कितीहि प्रबुद्ध व स्वार्थत्यागी इतिहास-साहित्य संशोधक असले, तरी हाती सापडेल त्या भल्या बुऱ्या चितोऱ्यावर जेव्हा ते आपल्या अकलेला तणावा देऊन विचित्र सिद्धांताची निष्पत्ति सिद्ध करू पहातात, तेका मात्र त्यांच्या विद्वतेवर पुण्याच्या डेक्कन बँकेचा प्रसंग ओढवतो. याला साधा व्यवहारीक दृष्टांतच द्यायचा तर आम्ही असे म्हणू की. मोडतोड तांबा पितळ करणारा मारवाडी उद्या जर मेटल अॅनालायझरचे (धातुसंशोधन) काम करू लागेल, तर ते जितके हास्यास्पद क्वचित तिरस्कारापद होइल, तितकेच दूषणार्ह कार्य ही भावे अॅन्ड कंपनी ऐतिहासिक गोष्टींची ठरवाठरव करू लागली म्हणजे घडते. यापेक्षा ही मंडळी राजवाड्यांच्या खंडाप्रमाणे जुने कागदपत्र जशाचे तसे नुसते छापून प्रसिद्ध करण्याचाच क्रम ठेवतील, तर त्यांचे उपकार महाराष्ट्र विसरणार नाही. मराठ्यांच्या इतिहासाचे साहित्यच जेथे अझून पुरे उमगलेले नाही, तेथे लेकाच्यानी ठाम सिद्धांत कसले ठोकीत बसता?
भारत इ. सं. म. च्या चतुर्थ से. वृत्तांतील कायस्थदीपाबद्दल आमचा वाद हाच होता. राजवाडयांनी ते जीर्ण गळाठे जसेच्या तसे प्रसिद्ध केले असते तर आम्ही किंवा कोणीहि त्याची दखल केली नसती. सापडला दस्तऐवज छापला. त्याचे महत्व ज्याचे ते घेतील पारखून दीपाला दिपवायला प्रदीप काही मेला नव्हता. तोहि आणखी छापला असता पण साहित्य कलेक्टर राजवाडे जेव्हा आपला योग्य अधिकार विसरून त्या गळावयाच्या जोरावर इतिहास- डिक्टेटर बनले व कायस्थ प्रभू समाजाला तुम्ही असेच आणि तुम्ही तसेच वगैरे बेजबाबदार वेदान्ती जजमेंट देऊ लागले, तेव्हा त्याच्या विद्वत्तेला पायबंद लावणे मंडळालासुद्धा जरूर पडले.
ऐतिहासिक गोष्टींचे सिद्धांत सिद्ध करण्याचे काम ऐतिहासिक कागदपत्रे हुडकून जमा करण्याइतके खास सोपे नाही. ते काम किती कठीण आहे, ते करण्याची पात्रता कोणाला असते, आणि ती पात्रता केव्हां प्राप्त होते. याविषयी ताळेबंद नियम खुद राजवाडे प्रभृतींनीच वेळोवेळी अनेक ठिकाणी व्यक्त केलेले असूनसुद्धा, स्वतःच्या अकलेचा दीप पाजळतांना मात्र त्या नियमांची त्यांना मुळीच आठवण होत नाही हे कसें? खुद्द राजवाडेच काय म्हणतात ते पहा एकादी मोडकी तोडकी बखर किंवा फाटकी तुटकी पोथी सांपडली म्हणजे संशोधन झाले, असे समजण्याचा आता काळ राहिलेला नाही. (इ. ऐ. पृ. १९) कारागीर कितीही कुशल असो, कितीही नकशी काम करणारा असो. अज्ञांच्या आग्रहानें व स्वतः च्या उतावीळपणाने तुटपुंज्या सामग्रीच्या लेच्यापेच्या जोरावर तो जर इमारत उठवून देण्याची हांव बांधील, तर त्याच्या या प्रयत्नाबद्दल तज्ञांच्या मनांत सकरुण तिरस्कार उत्पन्न होईल तशांत आहे ती तुटपुंजी सामग्री मुबलक व भरपूर आहे अशी समजून स्वतः इतिहासलिखित (?) करून घेउन चालू लागला, तर त्याच्या अज्ञपणाची कमाल झाली समजावयाची. त्यात ही मराठ्यांच्या इतिहासाची रूपरेघा सर्व कळली.
नवीन शोधाने फार तर एखाद दुसरी कानाकोपऱ्यातील नवीन बाब कळली तर कळेल अशी भावना एखाद्या लिलिखिषूनें उराशी धरली, तर त्याने आत्मवंचना करून घेतली, असेंच तज्ञांचे मत पडेल. ( इ. ऐ. पृ. २९) परंतु हाच नियम वारंवार ते दृष्टीआड कसा करतात याचे प्रत्यंतर म्हणजेच त्यांनी व त्यांच्या पुणेकर, धुळेकर, ठाणेकर, मिरजकर सांप्रदायिकांनी मराठ्यांच्या इतिहासातील अनेक गोष्टीचे सिद्धांत ठरविण्याचे केलेले राष्ट्रीय उपद्व्याप पाहिले म्हणजे दिसून येतें. कोणत्याहि काळाच्या इतिहासाच्या तपशिलाची ठरवाठरव करतांना, तत्कालीन परिस्थिति कशी होती आणि अमूक बाबतीत तत्कालीन लोकमताचा रंग कसा काय होता, इत्यादि अनेक गोष्टीच्या भूमिकेशी निर्णयकाचे तादात्म्य झाल्याशिवाय त्याला निश्चित निर्णय लावता येणेच शक्य नाही.
बाळाजी आवजीच्या वेळच्या राजनिष्ठेच्या कल्पनांचे स्वरूप आधुनिक कायस्थांच्या कल्पनांच्या चण्यांतून पाहून ठरवू म्हटलें, तर ते श्वान एक तुकड्यास्तव चार नाना या कव्युक्तीपलीकडे बाळाजीची किमत अधिक ठरणार नाही. आधुनिक राजकीय चळवळीच्या चष्म्यातून शिवकालीन चळवळीच्या तपशिलाची ठरवाठरव म्हणजे शुद्ध गाढवपणाच नसेल तर निदान वेडेपणा तरी खास होईल तद्वतच प्रचलित विचारक्रांतीच्या दृष्टीने शिवकालीन ग्रामण्यांच्या तपशिलाचा उहापोह करून निर्णय-निश्चितीचा तोरा मिरविणें हा गाळीव मूर्खपणा होय. कोणतीही गोष्ट त्रयराशिकाच्या घाटणीवर ठरवू म्हटले तर मोठाच अनवस्था प्रसंग पण राजवाडे भावे प्रभृती मंडळी येथून तेथून एकजात त्रयराशिकी.
एका बाईला चार मुलें तर पांच बायांना वीस मुले झालीच पाहिजेत, अशी त्यांच्या विधानांची नेहमी घाटणी असते, अपवाद परिस्थिति भिन्नता इत्यादि गोष्टी विचारांत घेण्याची या शहाण्यांना मुळीच शुद्ध नसते. यांची आजपर्यंची राजवटच अशी की आधी सिद्धांत आणि मग संशोधन. अर्थात् निश्चित सिद्धांतासाठी सरळ मजकुरातुनसुद्धां वांकड्या विधानांचे धागे ओढून काढणें या जिवाजीराव कलमदान्यांच्या शाई भरल्या हाताच्या हाताचा मळ होतो. कायस्थदीप पाळांना संभाजी कायस्थ प्रभूंच्या धार्मिक हक्कांसंबंधी दिलेल्या प्रतिकूल जजमेंटाची लोणकडी थाप जेव्हां राजवाड्यांनी बिनदिक्कत झोंकून दिली, तेव्हां एका १२ वर्षाच्या पोराच्या गळ्यांत आपण कसली घोरपड लटकवून, आपल्या पोरकटपणाचे प्रदर्शन करीत आहोत, याचे त्यांना भान राहिले होते काय?
राजवाड्यांनी हा पोरकटपणासुद्धा एका दस्तऐवजाच्या पुण्याईवरच केला होता नाही असे नाही पण तो चिठोरा कितपत विश्वसनीय आहे; तो कोणी का कशाला लिहून ठेवला आहे. यातल्या मजकुरात सुसंगतपणाचे व विसंगतपणाचे प्रमाण किती आहे. बाळाजी आवजीविषयी बाळा परभू नाशिक पंचवटीचा राहणारा, असले दिव्य ऐतिहासिक ज्ञान प्रसविणारा लेखक पाजी की गाजी, याचा विचार करायला इतिहास संशोधनेश्वर राजवाडयांना फुरसत होती कुठे?
आधी सिद्धांत मग संशोधन या राष्ट्रीय सूत्राबरहुकूम कायस्थाची बदनामी करणारा सापडेल तो पुरावा त्याच्या तोडावर झुगारून देण्यापलीकडे त्यांना विशेष काही करावयाचेच नव्हते. मग या असल्या झटपट रंगारी निर्णयकर्मात १२ वर्षाचा मराठा संभाजी वैशासपन्न वाईकर चित्पावन लेल्याचा बाप जरी ठरला तरी राजवाड्यांनी पर्वा ठेवीली नाही (ज्या चितोत्याच्या पुण्याईवर १२ वर्षाच्या संभाजीच्या गळ्यांत कायस्थांच्या धर्मनिर्णयाच्या कमिशनरशिपचे लोढणे राजवाड्यांनी अडकविले, तो चिंतामणराव सांगलीकराच्या `राष्ट्रीय` (अ)धर्म ग्रंथप्रसूति फॅक्टरीत निपजलेला अस्सल दस्तऐवज आम्ही आमचे मित्र श्री वासुदेव सिताराम बेंद्रे में पुणे यांच्या मार्फत भारत इ. स. मंडळास १९२१ साली आहेरादाखल नजर पाठविला आहे. त्याच्या अस्सलपणाचा निर्णय द्यायला मंडळास अझून फुरसत झाल्याचे दिसत नाही) या स्वार्थी मानव सृष्टीत परस्पराविरूद्ध भावनाच्या झटापटीचे दाखले नेहमीच आढळणार. त्यांतून निश्चित सिद्धांत काढून वास्तवीक परिस्थितीचे रूप निस्पृहपणे जगापुढे मांडण्याचे कर्म फार बिकट आहे.
हे न्यायधीशाचे कर्म बजावणारा असामी रामशास्त्र्याच्या मसाल्याचा असावा लागतो.
इतिहास संशोधनाचा धंदा करणारे आधुनिक राजवाडे भावे देव प्रभृति लोक विद्वत्तेच्या किंवा कार्यकनिष्ठतेच्या बाबतीत खानदेशी श्रीखंडापेक्षा कितीहि घट्ट असले, तरी पेशव्यांच्या सैतानशाही परंपरेचे रक्त त्याच्या धमन्यात सणाणत असल्यामुळे ऐतिहासिक निर्णयकर्माच्या बाबतीत त्यांची नालायकी इतिहाससिद्ध आहे. त्यांनी रामशास्त्र्याच्या निस्पृहनिर्णयकौशल्याचा दिमाख चित्पावनंतर अफाट महाराष्ट्रीयांपुढे तरी मिरविण्याचे साहस करू नये. मराठ्यांच्या इतिहासाविषयी या लोकांच्या सिद्धांतांची मराठ्यांना (अखिल चित्पावनेतर महाराष्ट्रीयांना) मुळींच जरूर नाही. उलट सुलट दस्तऐवज नेहमीच सापडणार, परंतु त्यांच्या अस्सल कमअस्सलपणाचा निर्णय ठरवायला स्वराज्यद्रोही पेशव्यांच्या सांप्रदायिकांनी विनाकारण आपली हिणकस देशप्रीति जाहिर लिलावांत विक्रीस काढू नये. जनतेचाच जेथे या लोकांवर सर्व बाबतीत पूर्ण अविश्वास व अनादर, तेथे यांच्या सिद्धांतकौमुदीचे चौज पुरवायला त्यांच्या बगलबच्चांशिवाय दुसरा कोण लाभणार? ब्राह्मणेतर दुनियेला पायातली खेंटरे ठरविण्यासाठी खाटे बनावट (राशीणति लिहून फैलावा करणारे चिंतामणराव सांगलीकर, निळकंठ शास्त्री थत्ते, मराठ्यांच्या स्वराज्याबरोबरच त्यांच्या इतिहासाची साधनें जाळून पोळून फस्त करणारा बाळाजीपंत नातू, बनावट कारस्थानांची उभारणी बेमालूम करण्यासाठी खोटे शिक्के, सह्या करारनामे वगैरेची पूणेरी टांकसाळ काढणारा बाळकोबा तात्या केळकर, असली इरसाल राष्ट्रीय रत्ने ज्या खाणींत पैदा झाली, त्याच खाणीतल्या बृहस्पतीनी ऐतिहासिक सिद्धांतनिरूपणाचे खरे राजवाडे हेव असा कितीहि कंठशोष करून दुनियेला चकविण्याचा भाव धरला, तरी त्यांच्या पुराणांवर कोण विश्वास ठेवणार?
आजहि दुनियेला झुकविणारे व भविष्यकाळाच्या इतिहासज्ञांची सपशेल दिशाभूल करणारे वाड्मय `राष्ट्रीय` सज्जन निर्माण करीत आहेतच की नाहीत! मिसेस अॅनी बेझंटनें मैत्रेयावताराचा पुकारा करताच अवतारकृत्याचा पोरखेळ म्हणून कोलाहल करणारा केसरी आज कै. टिळकांच्या बाबतीत कसले खेळ खेळत आहे? टिळकांच्या एका कल्याणानें तर त्यांना चतुर्भुज विष्णु बनवून पुणेरी पगडी जोड्यासह शेषाच्या उरावर नेऊन बसविलें आहे. आणखी शंभर वर्षांनी टिळकांना दोन हात होते की चार हात होते? टिळक देव की माणूस? असल्या वादविवादावर टिळकांचा शेषाशायी फोटो प्रमाणभूत मानून ते चार हाताचे ईश्वर होते असा ऐतिहासिक सिद्धांत त्या वेळचे एखादे भावे किंवा राजवाडे खास ठरवतील.
इतकेच नव्हे तर रामकृष्णादिकांप्रमाणे टिळक महात्म्याचा पावनपणा सिद्ध करणारा ओवीबद्ध टिळकायन ग्रंथ आजच कोणीतरी खरडीत बसला असेल. इतका भरपूर दस्तऐवजी व फोटोग्राफी पुरावा जरी पुढे आला, तरी भविष्यकाळी टिळकांचा खराखुरा माणुसपणा सिद्ध करणारा विरोधक त्या वेळी खात्रीने अस्तित्वांत असेलच. परंतु राष्ट्रीयाच्या राष्ट्रीय प्रयत्नांचा रोख मात्र भावी इतिहासाला कसा घोटाळ्यात टाकणारा आहे. एवढेच येथे दिग्दर्शित केले आहे. भविष्य काळाला ठकविण्याची ज्यांची चतुराई इतकी दूरदृष्टीची, त्यांनीच भूतकालांतल्या गोष्टींना आपल्या कल्पनांचे बरे वाईट रंग फासटून, तर्काच्या हातबोटावर त्या वाटेल तशा नाचविल्या तर आश्चर्याला जागाच कोठें उरतें?
चित्रमयजगतमधील `शिवाजीची वंशकुळी’ हा लेख श्री. भावे यांनी आधी सिद्धांत मग संशोधन याच धोरणाने खरडलेला आहे. शिवाजीला राज्याभिषेकसमयी ब्राह्मणांकडून जो उपसर्ग पोचला, त्या विषयी आधुनिक ब्राह्मणबुवाना हरहमेश लज्जेनें खाली मान घालण्याचे प्रसंग येतात. विशेषतः सार्वजनिकत्वाच्या ढोंगाखाली स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे कार्य साधण्यासाठी राष्ट्रीय ब्राह्मणांनी जेव्हा शिवाजी उत्सवाला डोक्यावर घेऊन नाचण्याची सुरूवात केली, तेव्हांपासून तरी शिवकालीन ब्राह्मणांच्या कृतघ्नतेचे व शिरजोरपणाचे मोठेमोठे काटे राष्ट्रीय चळवळ्यांच्या पायांत विशेष ठळक रीतीने रुतू लागले. शिवाजीला विरोध करणाऱ्या ब्राह्मणांच्या उपसर्गाबद्दल स्पष्ट स्पष्ट पुरावे देणारे शेंकडो कागद आजपर्यंत इतके उपलब्ध झालेले आहेत, आणि खुद्द राजवाड्यांनीसुद्धां आपल्या बहुमोल खंडांत ते प्रसिद्ध केले आहेत, की ब्राह्मणांच्या हरामखोरीचा तो पुरावा उलथून पाडण्यासाठी शिवभारताचा कर्ता परमानन्द भटचसा काय, पण श्री. भावे यांनी अखिल ब्राह्मण समाजाच्या बेचाळीस पूर्वजांना जरी मदतीला बोलाविलें तरी तो मृत्युलेखा इतकाच अनिवार्य व चिरंजीव राहणार आहे. तथापि शिवकालीन ब्राह्मणांच्या भिक्षुकशाही शिरजोराडाडलेल्या होळीवर आपल्या विद्वतेच्या उपरण्याचे पांघरून घालून त्याची धग किंचित थंड पाडण्याचा त्यांनी प्रस्तुत जो अव्यापारेषु व्यापार केला आहे, तो पाहून त्यांच्या प्रयत्नाबद्दल जरी एखाद्या राष्ट्रीय प्राण्यानें त्यांचा सकौतुक गौरव केला, तरी साधारण बुद्धीमत्तेचा मनुष्यसुद्धां त्यांची कीव केल्याशिवाय राहणार नाही.
शिवाजी महाराज आणि शिरजोर ब्राह्मणवर्ग, यांचा परस्पर संबंध किती प्रेमाचा होता, याविषयीचे पुरावे महाराष्ट्राला आज भाव्यांपासून घ्यावयाचे नाहीत. आज महाराष्ट्रात असें एकहि सुशिक्षित कुटुंब आढळणार नाही की ज्याला शिवराज्याभिषेकोत्सव प्रसंगी ब्राह्मणांनी धर्माच्या नांवावर खेळलेल्या धुळवड शेणवडीची माहिती नाही. परंतु सिद्धांताला संशोधनाचा बाप ठरविणाऱ्या श्री. भाव्यांना हा प्रचलित इतिहास उलथून पाडण्यासाठी दोन सिद्धांत सिद्ध करावयाचे आहेत आणि म्हणूनच त्या धोरणाने त्यांनी कांही सटरफटर आधार जमा करून आपली विधाने रंगविण्याचा प्रयत्न केला आहे. ते सिद्धांत हेच (१) शिवाजीविरुद्ध ब्राह्मणानी कोणतेहि आक्षेप घेतले नाहीत किंवा कसलाहि धार्मिक बखेडा केला नाही, आणि (२) बाळाजी आवजीनें गागाभट्टाला दक्षिणेत आणण्याची जी खटपट केली तिची कांही जरूर नव्हती, तो त्या रिकामटेकड्यानें स्वतः च्या स्वार्थासाठी हकनाहक उपद्व्याप केला. सारांश आमचे लेखनकुशल विश्वमित्र ब्राह्मणांच्या थडग्यावर उमटलेली पागलपणाची सृष्टि अलगद उचलून बाळाजी आवजीच्या थडग्यावर निर्माण करण्याची खटपट करीत आहेत.
श्री. भावे म्हणतात बाळाजी आवजींनी उत्तरेस श्रीक्षेत्र काशी येथे जाऊन मोठ्या मिनतवारीनें गागाभट्टाची समजूत काढून केवळ राज्याभिषेक समारंभासाठी त्यास दक्षिणेत आणिलें, हें म्हणणेंहि बरोबर नाही. "याचे कारण" गागा हा शिवाजी महाराजांच्या जुन्याच परिचयाचा होता... आणि त्याला आणण्यांत बाळाजी आवजीच्या दगदगीची व श्रमसाहसाची मुळींच आपेक्षा नव्हती.
"भले बहाद्दर! कलमाच्या एका फटक्याने आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्व बखरी आणि जस्टिस रानडे तेलंगापासून तो राजवाडे सरदेसाई सान्यापर्यंत दरोबस्त इतिहास संशोधक श्री. भावे यांनी अव्वल नंबरचे पागल ठरविले! याचें नांव इतिहास संशोधन याला आधार कशाचा? तर एका शिवभारत पोथीचा, पोथीशिवाय आमच्या चित्वापन संशोधकांच्या अकलेचा "दीप" कधीच पाजळला जायचा नाही आश्चर्य वाटते ते हे की, शिवभारतापेक्षांही शेंकडों कागदपत्रांचे दस्तऐवजी महाभारत ब्राह्मणांच्या उरावर तेव्हा आदळले असतांहि त्यांच्या धार्मिक गुंडगिरीची तीव्रता कमी झाली नाही, ती आता भाव्यांनी परमानंदाचें चोपडें उकरून काढले म्हणून थोडीच होणार आहे? परमानंद भटाच्या शिवनिष्ठेवर अखिल ब्राह्मणांची शिवद्रोहाने काळी ठिकर पडलेली तोंडे उजळ होणे शक्य नाहीं हेंच काय, पण गागाभट रायगडास आल्यावरसुद्धां राज्याभिषेकाच्या वेळेस लागणारे मंत्र गागाभट म्हणेना; सबब राजकीय धोरण त्याजपुढें मांडावे लागलें " (मराठयांच्या सत्तेचा उत्कर्ष पृ. १६३ ) हे कशाचे लक्षण?"
राज्याभिषेकापूर्वी अनेक वर्ष महाराष्ट्रांतील वैदिक ब्राह्मणांस महाराजांचे क्षत्रियत्व पूर्णपणे मान्य होते याचे काय? या प्रकरणाचे इतके मुबलक दस्तएवजी पुरावे आजपर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यांत ब्राह्मणांनी शिवाजीला दिलेल्या कृतघ्नतेच्या उपसर्गाबद्दल इतकी स्पष्टस्पष्ट एकवाक्यता आहे की ब्राह्मणांच्या नकली उदारमतवादित्वाचे भाव्यांचे हे चित्पावनी पुराण एखादे शेंबबडे पोरसुद्धां मान्य करणार नाहीं. भावे म्हणतात "मालोजीराजे हे ब्राह्मणांकरवी आपलें घरात आग्निहोत्र चालवीत, व ब्राह्मण तो विधि यथासांग संपादित असत." असें शिवभारताच्या १ ल्या अध्यायांत म्हटलें आहे. पोथी लिहिणारा शिवनिष्ठ असल्यामुळे, त्यानें आपल्या तत्कालीन जातभाईंच्या मताची पर्वा न करिता शिवाजी महाराजांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी असले विधान घुसडलें असल्यास नवल नाहीं.
चिटणीशी बखरींतसुद्धां शिवाजीच्या प्रबुद्धतेची माहिती देतांना षोडशविद्या आणि चौसष्ट कलांची सुप्रसिद्ध यादी मोठ्या भाविकपणानें त्यानें उद्धृत केली आहे. म्हणजे त्यावरून शिवाजीमहाराज हे चांगले गाणारे, नाचणारे, जुन्या खेळणारे होते. असे विधान करणे पोरकट ठरल्याशिवाय कसे राहिल? शिवाय मालोजीची पिढी व शिवाजीची पिढी यात कांही शतक दोन शतकांचे अंतर थोडेच होते? मालोजी जर खराब आग्निहोत्री असता तर शिवाजीवर शूद्रत्वाचे काहूर उठले तेव्हां चाणाक्ष बाळाजीकडून नुसता नेत्रसंकेत होतांच शिवाजीनें आपल्या घरांतून आज्यार्थे अग्निपात्र आणवून क्षत्रियत्वाचा हा घ्या पुरावा म्हणून शिरजोर ब्राह्मणांच्या थोबाडावर ते भिरकवण्यास केव्हांहि कमी केले नसते, किंवा आपल्या आज्याच्या घरांत यथासांग अग्निहोत्र चालविणान्या भटांना तात्काल बोलावून त्यांच्याकडून विरोधी ब्राह्मणबुवांची आहुति त्याच अग्निकुंडांत द्यायला खास मार्गे पुढे पाहिलें नसतें. एवढे मोठे जाडजूड इतिहास संशोधक आणि त्यांना एवढी साधी गोष्ट समजू नये? मालोजीच्या घरांत जर अग्निहोत्र होते, तर त्याचा मुलगा शहाजी आमरण मुंजीशिवाय का राहिला आणि राज्याभिषेकाच्या घटकेपर्यंत शिवाजीचीहि मुंज का झाली नाही. याला श्री. भाव्यांचे काय उत्तर आहे? खुद्द मालोजीची तरी मुंज झाली होती काय? परंतु शिवाजी महाराजांविरुद्ध ब्राह्मणांच्या बापजाद्यांनी केलेल्या भिक्षुकशाही बंडाचा अधमपणा झाकण्यासाठी आणि बाळाजी आवजीच्या कामगिरीला कवडीमोल उपद्व्याप ठरवून त्याला पागल बनविण्यासाठी हे विचित्रवीर्य संशोधक आपल्या अकलेचे तारे कसे तोडतात ते पहा.
महाराष्ट्र विद्वान् भिक्षुकांना महाराजांचे क्षत्रियत्व पूर्णपणे मान्य होते. तसेच ते इतर महाराष्ट्र ब्राह्मणांनाही मान्य व मंजूर होते. इतर ब्राह्मणांना त्याचा पुरावा रोजच्या रोज दिसत होता. शिवाजी महाराजांनी आपल्या तरवारीने ते उत्तम प्रकारें शाबित केलें होतें. व तशांतूनहि कोणास शंका असल्यास ते वाटेल तेव्हां तें सिद्ध करण्यास आपली तरबार घेऊन तयार असत. हे शाबित करण्यास कोणाहि मध्यस्थाच्या लटपटीची गरज नव्हती. शिवाजी राजांचे मौजीबंधन राज्याभिषेकापर्यंत केलें नव्हते.
वयाच्या ४५ व्या वर्षापर्यंत मौजीबंधन न होणे ही बाब जरा नवलाची असली तरी एकंदरीने गौण आहे. असल्या सबबींचा दरकार महाराष्ट्रानें केव्हांच केला नाही. [ओहो!] व शिवाजीचे क्षत्रियत्वाबद्दल संशय दाखवून राज्याभिषेकास अडचणही उभी केली नाही. "मराठे बांधवांनो, विप्रोत्तम भावे यांचे हे अनन्य शिवनिष्ठेचे पुराण ऐकून शिवकालीन ब्राह्मणांबद्दल तुमची आढी आतां सोडून द्या. आणि ती `उपद्व्यापी मध्यस्थ` बाळाजी आवजीविषयी अतः पर घरा. इतकेंच नव्हे, तर शिवकालीन ब्राह्मणांच्या या सात्विकतेचें उतरायी होण्यासाठी, पुण्याच्या नियोजित शिवस्मारकाच्या शेजारीच अखिल महाराष्ट्रीय ब्राह्मण समाजाच्या वतीने साळसूदपणाची वकीली करण्यास पुढे सरसावलेल्या या उलट्या बाहुल्याच्या चित्पावन संशोधकासाठी एक जयस्तंभ उभारा. अतः पर चिटणीस सांप्रदायिक लटपट्या मध्यस्थ` कायस्थांच्या नादी मुळीच न लागतां यमाजी शिवदेव, नाना फडणीस, नारायणराव पेशवे, छत्रपतींच्या राजघराण्याची बडदास्त ठेवणारे रावबाजी, बाळाजी पंत नातू, भरदिवसा पुण्याची होळी करणारे महात्मा हरीपंत भावे इत्यादि थोर थोर सात्विक अवतारी पुरुषांच्या `राष्ट्रीय ` वंशजांची कास धरा. म्हणजे मुळशी पेट्यांतल्या धरणासारख्या अनेक इहलोकच्या वैतरण्या पार पडून राष्ट्रीय पेशवाईच्या पुनरुज्जीवनांत तुम्हाला इतिहासाच्या पुनरावृत्तीचे स्वानंदसाम्राज्य खास लाभेल, असा श्री. भाव्यांचा तुम्हाला इतिहाससिद्ध राष्ट्रीय संदेश आहे. हे लटपटे मध्यस्थ कायस्थ तुमचा घात करतील. सात्विकतेचे अर्क जे ब्राह्मण त्यांनी शिवराज्याभिषेकास मुळीच काही विरोध केला नाही कशावरून म्हणता? कशावरून म्हणजे? अहो, राज्याभिषेक कसा साजरा झाला त्याचा इतिहास पहा तो पाह्याला फुरसत नसेल तर भाव्यांच्या सूत्रात्मक राष्ट्रीय वेदान्त पहा. भावे जेहेते म्हणतात त्या उत्सवात समर्थ रामदास स्वामीनी पूर्ण सहाय्य केले. मोरोपंतांनी अभिषेक केला. हणमत्यांनी पवित्र जलसिंचन केले. गागाभटजीनी मंत्र म्हटले व हजारों ब्राह्मणानी आशिर्वाद देऊन आपली पूर्ण संमति जाहीर केली. घ्या, ब्राह्मणांच्या स्वराज्यप्रेमाचा आणि छत्रपतिनिष्ठेचा आणखी पुरावा काय पाहिजे? रामदासापासून तो आशिर्वाद द्यायला (भीक मागायला नव्हे!) रायगडावर धावत पळत आलेल्या पाच हजार भिक्षुकापर्यंत पाहून घ्या. सारे एकजात ब्राह्मण कायस्थ मराठे प्राणी सारे ठार मेले होते की काय नकळे! पण त्याचाहि खुलासा श्री भायें येणेंप्रमाणे करतात. "पण या प्रकरणात ज्यास आपला हेतु साधला नाही ते मात्र तोंडाने नुसती वटवट करीत हात चोळीत बसले व राज्याभिषेकाच्या ज्येष्ठ महिन्याचा त्यांनी फाल्गुन मास केला. "चित्पावनी पेचाची एकच टांग मारतांच शिवाजीचा इतिहास पहा आमच्या भाव्यांनी कसा उलटा पालटा केला तो! ज्येष्ठांत फाल्गुन उरकणारे कोण?”
भाव्यांचे पूर्वज ब्राह्मण तर खास नव्हते; कारण ते सारे राज्याभिषेकविधीत गुंतले होते कोणी पूर्ण सहाय्य देत होते, कोणी जलसिंचन करीत होते आणि बाकीचे `आशिर्वाद घोष करीत होते. अर्थात असा हा मंगलविधि चालू असतांना शिमग्याच्या शंखध्वनीत फक्त ब्राह्मणेतर, विशेषतः कायस्थ प्रभू त्यांतूनहि विशेषत: बाळाजी आवजी चिटणीस हेच काय ते रममाण झाले होते. असा भाव्यांचा राष्ट्रीय सिद्धांत आहे.
इतके नीच वृत्तीचे बेजबाबदार विधान, राजवाड्याच्या कायस्थदीप प्रबंधानंतर आज पाच वर्षांनी पुनश्च महाराष्ट्रीयांपुढे येत आहे. ज्येष्ठातच शिमगा काय पण बाराही महिने अष्टौप्रहर ब्राह्मणेतरांच्या नावाने बोंबाबोंब करण्यास सवकलेल्या या अकलेच्या धसांना या चित्पावन इतिहास-संशोधकांना आम्ही पुनश्च बजावून ठेवतों की अशा प्रकारच्या मल्लीनाथी बुरख्याखाली प्रत्यक्षाप्रत्यक्ष होणारी बदनामी निमूटपणे सहन करण्याइतका ब्राह्मणेतर समाज आज मेलेला मुडदा नव्हे.
बाळाजी आवजीच्या राष्ट्रसेवेला कवडीमोल ठरवून लोणकड्या थापांनी मराठे बांधवांच्या सहानुभूतीला बगलेत मारण्याचा तुमचा राष्ट्रीय कावा न ओळखण्याइतके तेहि आज भोळसट राहिलेले नाहीत शिवकालीन ब्राह्मणांच्या हरामखोरपणाचा विस्तार केवळ मराठी दप्तरांतच मर्यादित झालेला नसून त्याच्या पाळ्यामुळ्या परकीय बखरकारांनी महाराष्ट्रातून स्वतः उपटून नेऊन पुराव्यासाठी नीट जपून ठेविल्या आहेत. बाळप्रभू चीटणीसाच्या, किबहुना तत्कालीन अखिल कायस्थप्रभू समाजाच्या उज्वल पराक्रमानें हतप्रभ ठरलेल्या चित्पावन समाजातल्या राष्ट्रीय पंडितांनो, बाळप्रभू चिटणीसाच्या घराण्यावर स्वार्थलोलुपतेचा व लटपट्या मध्यस्थीचा म्हणजेच जवळजवळ उपद्व्यापी कुंटणपणाचा आरोप करण्यापूर्वी दहा अंक मोजून तुमच्या बेजबाबदार कृतघ्न लेखणीचा टांक न तोडाल तर आम्हां मानवी सल्लागाराच्या शक्ति जरी उद्या निसर्गधर्मानुरूप थंड पडल्या तरी शिवरायानें कायस्थाच्या आणि रक्ताने प्राणप्रतिष्ठा केलेली ती महाराष्ट्राची जिवनदेवता तुमच्या जीमलीचे राइराइ टांक तोडल्याशिवाय खास रहाणार नाही हे लक्षांत ठेवा.
ब्राह्मणेतरांचा तेजोभंग करून, विशेषतः क्षत्रिय वैश्यांना शूद्राच्या कोंडवाड्यांत दडपून, आपला वरचढ सवतासुभा प्रस्थापित करण्यासाठी भिक्षुकशाहीने पुराणकाळात नंदान्तं क्षत्रिय कुल! म्हणजे नंदानंतर क्षत्रिय वर्ग की बीयाण्यांसकट ठार झाला, असे एक भिक्षुकी सूत्र उत्पन्न केले. या सूत्राची उत्पत्ति झाल्यानंतरहि अनेक वेळा क्षात्रतेजानें भरतखंडाला गदगदा हालवून सोडले. तरीसुद्धा चालू घटकेला त्याच सूत्रांचे खंडण करून क्षत्रियांच्या अस्तित्वाविरुद्ध कंठशोष करणारे हाजारों थे. शा. संपन्न भिक्षूक, शेंकडों विद्वान् चित्पावन व बृहस्पति शंकराचार्य आहेतच. क्षत्रियत्वाचे अस्तित्व जसें क्षत्रियानी अनेक वेळां आपल्या क्षात्रतेजानें सिद्ध केलें. त्याचप्रमाणे ते अनेक विवेकी ब्राह्मणांनीहि आपल्या मुर्दाड जातभाईंच्या हुलडखोर मतांची पर्वा न करता, स्पष्टपणे मान्य केल्याचे दाखले इतिहासांत आहेत व आजसुद्धा अनेक सज्जन ब्राह्मण बोलून किंवा लिहून व्यक्त करतात. म्हणजे यावरून असा सिद्धांत काढतां यावयाचा नाही की क्षत्रियाचे अस्तित्व आज सर्रास सर्व ब्राह्मणांना पूर्ण मान्य आहे.
अवघे तीन महिन्यांचे तात्पुरतें लष्करी शिक्षण मिळाले असतांहि जर्मन- गरूडाची फ्रान्सवर आलेली मिरीरीची झांप परतविण्यासाठी गेल्या महायुद्धांत कोकणांतल्या `रांगड्या मराठ्या जवानांनी व अस्पृश्य मानलेल्या महारांनी अद्भुत पराक्रम दाखविला. तो या दर्भसमिधाबहादर भिकमाग्या भिक्षुकांना जरी अवगत नसला, तरी तो महायुद्धाच्या इतिहासांत, फ्रान्स, इंग्लडच्या हृदयांत आणि युरोपियन लढवय्यांच्या डोळ्यांत आदरातिशयाच्या सिंहासनावर विराजमान झाला आहे. पंजाबातल्या शीखांचा व नेपाळांतल्या गुरख्यांच्या लढवय्येपणाबद्दल केवढा बोलबाला! पण पारीसच्या सरहद्दीवर जेव्हा जर्मनांच्या डुकरमुसंडीला तोंड देण्याचा प्रसंग येऊन बितला तेव्हां हे शीख आणि गुरखे कसे भेदरले बिकानेरच्या महाराजांनी छत्रपति शिवाजी महाराजांच्या नावाला तुम्ही काळीमा फासणार काय? असा जाब रजपूत मराठ्यांना सवाल टाकतांच मेजर डफळ्यांनी सर्रकन् म्यानातून तलवार काढून उंच उभारतांच जाठ रजपूत मराठ्यांनी “बोलो शिवाजी महाराजकी जय!” अशी गगनभेदी गर्जना कशी केली आणि पाण्याचा एक घोंटही न पितां ताबडतोब जर्मनीच्या मोर्च्यावर लांडगेतोडीचा हल्ला चढवून अवघ्या ६ तासांत जर्मन शत्रूंना पारीस पासून ४७ मैलांवर रेटीत नेऊन कसे उद्वस्थ केले. या गोष्टी केसरीच्या महायुद्धवार्तेत किंवा खाडीलकरांच्या मासिक युद्धचर्चेच्या चित्रमयजगती श्राद्धविधीत जरी ठळकपणे नमूद नसल्या तरी त्यांची प्रत्यक्ष परिचयाची साक्ष द्यायला बिकानेरचे रणगाजी महाराज आज हयात आहेत.
पेशव्यांच्या सैतानशाहीनें बोथट केलेल्या महाराष्ट्रीय महार मराठ्यादि क्षत्रियांच्या तलवारी कावेबाज इंग्रज कुफणीनें आर्म्स आक्टाच्या कफणाखाली दफणल्या दिवसापासून. त्या बिचाऱ्यांच्या सर्व महत्वकांक्षा नांगरांत अडकून राहिल्या. तरी पण वेळ येताच रक्तांत जिवंत राहिलेल्या क्षात्र तेजानें युरोपखंडात मराठ्यांच्या तलवारीचें पाणी दाखविलें, युरोपियन लढवय्यांच्या तोंडचें पळालेले पाणी आनंदाच्या व विस्मयाच्या अतिरेकाने डोळ्यांतून बाहेर काढले आणि `ब्रेव्ह इंडियन टायगर [जीते रहो हिन्दुस्थानका शेर] असा प्रशंसेचा जयजयकार आबालवृद्ध युरपियन स्त्रीपुरुषांच्या तोंडी सर्वत्र रूढ केला.
क्षात्रगुणकर्माची ही प्रत्यक्ष जिवंत प्रचीती आजच्या जिवंत ब्राह्मणबुवांच्या उघड्या डोळ्यासमोर असतांहि त्याच लढवय्या मर्द महारांना अस्पृश्य म्हणायला सर्रास ब्राह्मणांच्या जिव्हा चुकत नाहींत. कोंकण घाटावरच्या शिवाजीच्या याच रणधुरंधर मराठे जवानांना संबंध रत्नागिरी जिल्हयांत श्री. भावे बोडसांचा एकही जातभाई शूद्र अशी शिवी हासडण्यास अझूनही शरमत नाहीं, किंवा शिववंशीय करवीरकर छत्रपतीनी क्षत्रियोचित वेदोक्त धर्माचरणाचा आग्रह धरतांच टिळकांपासून तो बोडसापर्यंत एकजात चित्पावनांच्या अंत:करणाची होळी पेटल्याशिवाय रहात नाही. मराठे क्षत्रिय की शूद्र हा वाद शिवाजीच्या वेळेपासून चालला आहे व नुकतेच तंजावरच्या कोर्टानें कोल्हापूरच्या महाराजांस शूद्र ठरविलें, तरी तेवढ्यानें लोकांचे समाधान होत नाही, (चित्रमयजगत् वर्ण-व्यवस्था जाने १९१९) हे ममईच्या बोडसाने काढलेले उद्गार
श्री. भाव्यांच्या प्रत्यक्ष डोळ्यांत नसले तरी डोळाखालून खास गेले असले पाहिजेत. या बोडशी उद्गारांचा भावार्थ काय? चालू घटकेला आखिल महाराष्ट्रीय विद्वान् ब्राह्मणांना मराठ्यांचे क्षत्रियत्व पूर्णपणे मान्य आहे असाच भावार्थ निघतो काय? श्री. भाव्यांनी स्पष्ट उत्तर द्यावे. क्षत्रियांच्या क्षात्रवीर्याचा जागताज्योत पुरावा महायुद्धाने ब्राह्मणांच्या छाताडावर प्रत्यक्ष पाय देऊन उभा केला असताहि चालू घटकेला क्षत्रियांचे अस्तित्व, विशेषतः मराठ्यांचे क्षत्रियत्व ज्या विद्यमान भावे बोडशी ब्राह्मणांना लवमात्र मान्य होत नाही. त्याच शहाण्या जातीतल्या शहाण्या भाव्यानी शिवाजीच्या “क्षत्रियत्वाच्या" प्रत्यक्ष पुरावा रोजच्या रोज दिसत होता. शिवाजी महाराजानी आपल्या तलवारीने तो उत्तम प्रकारे शाबीत केला होता, व तशातूनहि कोणास शंका आल्यास तो वाटेल तेव्हां सिद्ध करण्यास आपली तरवार घेऊन ते तयार असत. हे शाबीत करण्यास कोणाहि मध्यस्थाच्या लटपटीची गरज नव्हती. "असली मल्लीनाथी करतांना जनाची नसली तरी निदान मनाची तरी लाज बाळगली पाहिजे होती.
क्षत्रियांनी आपलें क्षात्रतेज आताप्रमाणेच शिवकाळीहि जगाला पटवून दिले होते. आतांप्रमाणेच त्यावेळीहि परमानंद भटासारख्या काही विवेकी ब्राह्मणानी क्षत्रियांच्या अस्तित्वाला मान्यता दिली होती. आतांप्रमाणेच क्षत्रियांच्या क्षात्रवीर्याची तरफदारी करणारे बरेच संस्कृत ग्रंथ त्या वेळी जिवंत होते. शंकेखोरांचे शंकानिरसन करण्यासाठी ‘शिवाजी` तरवार घेऊन तयार असे आजचे क्षत्रिय महायुद्धातील जखमा व बिल्ले घेऊन तयार आहेत आणि आजचा मुर्दाड ब्राह्मण समाज मराठ्यांच्या किंवा अखिल क्षत्रियांच्या क्षत्रियत्वाबद्दल जितकी बोडशी पूर्ण मान्यता दाखवीत आहे, तितकाच उलट्या काळजाचा टिळकीपणा शिवाजीच्या वेळच्या भिक्षुकांत होता. म्हणूनच बाळाजी आवजीला, २० व्या शतकांतल्या ठाणेकर भाव्यांच्या विद्वत्तेची पर्वा न ठेवता, १७ व्या शतकांतल्या भटांची मगरूरी जिरविण्यासाठी गागाभटांकडून परस्पर पंजारा भडकविण्याची लटपटी मध्यस्थगिरी करावी लागली.
शिवाजीच्या क्षत्रियत्वाची साक्ष देणारे दस्तऐवजी पुरावे व जिवंत माणसे रगड होती. त्यांत दरबारी विवेकी ब्राह्मणहि असतील नाही असे नाहीं. परंतु तेवढ्याचानें किंवा परमानंद भटाचे चोपडे आता बाहेर पडल्याने राज्याभिषेक प्रकरणी शिवाजीविरुद्ध धर्मद्रोही कृतघ्नतेची बंडाळी ब्राह्मणांनी माजविलीच नाही. असल्या चित्पावनी विधानाने शिवकालीन ब्राह्मणांची काळी तोडे स्वच्छ करण्यासाठी श्री. भाव्यांच्या प्रस्तुत लेखाशिवाय इतर सर्व उपलका ऐतिहासिक साहित्य जाळून खाक करावे लागेल. शिवाजीच्या व अखिल मराठ्यांच्या क्षत्रियत्वाबद्दल परमानंदकृत शिवभारताशिवाय आणखी शेंकडो दस्तऐवजी पुरावे असूनहि सांपडतील. परंतु तेवढ्याने ब्राह्मणांचा हरामखोरपणा रतिमात्र कमी न होता. उलट एवढ्या समकालीन जबरदस्त प्रत्यक्ष पुराव्याला विरोध करणारांचा भिक्षुकी गाढवपणा मात्र अधिकाधिक सिद्ध होणार आहे. हे यांनी खूप ध्यानांत ठेवावे. एखाद्या परमानंदाने, जयराम पिंड्याने अथवा गागाभट्टानें शिवाजीचे क्षत्रियत्व आपपल्या ग्रंथांत नमूद करून ठेवलें, हा कांहीं "महाराष्ट्रांतील विद्वान वैदिक ब्राह्मणांस महाराजांचे क्षत्रियत्व पूर्णपणे मान्य होते" याचा पुरावा नव्हे, किंवा राज्याभिषेक प्रसंगी मोरोपंत पिंगळे, रघुताथ पंडीत प्रभृति मुर्दाड भिक्षुकांच्या उपरण्याखाली ब्राह्मणांनी केलेल्या हलकटपणाला खोटा ठरविणारा सिद्धांत नव्हे.
महाराष्ट्रांतल्या अखिल दर्भसमीधापटूंना जर भोसल्यांचे क्षत्रियत्व पूर्णपणे मान्य होतें, तर राज्याभिषेकाचा वेदोक्त विधि करणारा एखादा शंकराचार्य किंवा विद्वान ब्राह्मण त्या वेळी कां पुढे आला नाहीं? रायगडावर दक्षिणेचे शेण खायला धावत पळत गेलेल्या ब्राह्ममुखोत्पन्नांत काय एकहि विद्वान् पुरोहित नसावा? महाराष्ट्र ब्राह्मणांच्या उरावर काशीचा गागा आणून बसविण्याची काय जरूरी होती? का येथले सारे वे. शा. संपन्न आणि शंकराचार्य अचानक पटकी येऊन मेले होते? झाले होते तरी काय? या प्रश्नांची रोखठोक उत्तरे इतिहासांत नमूद आहेत. इतिहास जरी उद्यां मेला किंवा मराठी स्वराज्याप्रमाणेच नातुसांप्रदायिकांनी ठार मारला, तरी ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना दिलेल्या कृतघ्न उपसर्गाच्या तिडका मराठ्यांच्या आणि कायस्थ प्रभूंच्या रक्तांत वंशपरंपरेने चिरस्थायी होऊन बसल्या आहेत. सडकेवरील खड्याइतके भाव बोडस निर्माण होऊन त्यांनी जरी चित्रमय जगताची सर्व पाने खरडण्याचा राष्ट्रीयपणा जोरजोराने चालू ठेवला, तरी त्या तिडका नष्ट करण्यासाठी ब्रह्मदेवाची पुण्याई सुद्धां पुरी पडणार नाही,
आपण वादार्थ असे गृहीत धरून चालू की. श्री. भाव्यांनी लावलेला शोध अक्षरशः बरोबर आहे. शिवाजींचे क्षत्रियत्व महाराष्ट्रीय ब्राह्मणांना पूर्ण मान्य होते, आणि त्यांनी राज्याभिषेक प्रसंगी कसलाही राष्ट्रीयपणा केला नाही यावर असा प्रश्न सहाजीकच उद्भवतो की जर शिवाजीचें (अर्थात् अखिल मराठ्यांचे) क्षत्रियत्य महाराष्ट्रीय ब्राह्मणांना जर पूर्ण मान्य होतें तर त्याच शिवाजीच्या वंशजांचे क्षत्रियत्व त्यांना एकाकी का अमान्य झालें? छत्रपतींना व सर्रास मराठ्यांना शूद्र शिवी हासडण्याची त्यांची मर्जी का लागली? वेदोक्तच्याऐवजी पुराणोक्त विधीची त्यांच्यावर बळजबरी का होऊ लागली? क्षत्रिय कुलावतंस हा छत्रपतींच्या नांवामागे लागणारा मायना बदलून त्याऐवजी भोसले कुलावतंस हा चित्पावनी मायना कागदोपत्री रूढ करण्याची चिंतामणराव सांगलीकराला अवदसा का आठवली?" श्रीमंत महाराजांची मुंज्य पुराणोक्त विधि करून जाहली ही गोष्ट तुम्ही फारच उत्तम केली. "हें सर्टिफिकीट नाना फडणीसाने छत्रपतींच्या चित्पावन जेलरास-राजश्री बाबुराव स्वामीचे शेवेशी पाठविले त्याचा अर्थ काय? नाना फडणीसानें वेदोक्ता ऐवजी पुराणोक्त मंत्रांनी छत्रपतींच्या मुंजी तरी होऊ दिल्या, पण रावबाजीनें तर त्याहि अजीबात बंद केल्या`! महाराष्ट्रीय ब्राह्मणास शिवाजींचें क्षत्रियत्व पूर्ण मान्य असल्याचाच हा दाखला काय? प्रतापसिंह छत्रपतीच्या वेळी मराठ्यांवर ब्राह्मणांनी जी भयंकर ग्रामण्याची चढाई केली आणि कलीत क्षत्रिय नाहीत या मुद्यावर साताऱ्यांत जे भिक्षुकी रणकंदन माजविलें, ते याच मान्यतेचें द्योतक काय? शिवाजी जर क्षत्रिय होता तर त्याचे वंशजच तेवढे शूद्र कसे ठरले? नन्दातं क्षत्रियकूलम् झाल्यावर, महाराष्ट्रीय विद्वान दर्भधारकाच्या पूर्ण सहाय्याने शिवाजीला क्षात्रधर्मस्य नवावतारः ठरविले; मग पुढे कोणान्तं क्षत्रियकुलं झालें तें श्री. भावे सांगू शकतील काय?
कोल्हापूरचा वेदोक्ताचा धुमाकूळ म्हणजे जिवंत ब्राह्मणांच्या राष्ट्रीयपणाचे जिवंत स्मारक, कोल्हापूरच्या शिववंशज छत्रपतींना शूद्र ठरविण्यासाठी मेहेरबान भाव्यांच्या जातभाईंनी आपल्या जीवाचें नांव शिवा ठेवण्यांत मुळीच कसूर केलेली नाही. उलट तेजावर प्रकरणांत कोल्हापूरकर छत्रपतींना व सर्व मराठ्यांना मद्रासच्या शूद्र मुदलियर जज्जानें शूद्र ठरविल्याचें ऐकून लोकमान्य लोकश्री महादेव राजाराम बोडस चित्रमयजगतामध्ये आनंदानें टिया कुटूं लागले! कोल्हापूर वेदोक्त प्रकरणांत राजोपाध्यांना शाहू छत्रपतीनी गचांडी देऊन घरी बसविले, त्याबद्दल ज्ञानकोशकार डॉ. केतकर यांनी आपल्या` हिस्टरी ऑफ इन्डियन कास्टस नामक ग्रंथांत ( पृ. ६० फूटनोट ) असे गर्वोक्तीचे उद्गार काढले आहेत की पैशाच्या किंवा इतर लोभाने ब्राह्मण लोक वाटेल ते विधि वाटेल त्याच्या घरी करण्यास सिद्ध होतील, अशी कोणाची जर समजूत असेल तर ती साफ चूक आहे. ब्राह्मणाचा स्वत्वाचा अभिमान जेहत्ते काय कथन करावा! काय त्यांचे शील. केवढी धर्मचरणाची कडवी शिस्त आणि तीव्र स्वतंत्र निस्पृह बाणा! आजला सुद्धा अशा एका निस्पृह ब्राह्मणाने आपल्या वंशपरंपरागत चाळीस हजारांच्या जहागिरीवर लाथ मारली, पण शिवाजीच्या वंशजाच्या घराण्यांत वेदोक्त कर्म करण्याचे साफ नाकारलें." श्री. भाव्यांना आमचा सरळ सवाल आहे की आधुनिक विद्वान ब्राह्मणांची ही मुक्ताफळे तुम्हांला काय सिद्धांत पटवीत आहेत? शिवाजी तेवढा क्षत्रिय आणि त्याचे वंशज सातारकर व कोल्हापूरकर छत्रपति मात्र शूद्र, हे त्रागडे श्री माव्यासारख्या त्रयराशिकी संशोधकांनीच उलगडून दाखविलेले बरें. तथापि आम्ही थोडी मदत करतो.
शिवाजीचे क्षत्रियत्व मान्य करणाऱ्या तत्कालीन विद्वान महाराष्ट्रीय ब्राह्मणांना जर तुम्हाला स्वराज्यनिष्ठ, शिवप्रेमी व शहाणे ठरविणें असेल, तर त्याच शिवाजीच्या वंशजांना व अखिल मराठ्यांना शूद्र ठरविणाऱ्या पेशव्यांना व आधुनिक विद्वान् महाराष्ट्रीय ब्राह्मणांना स्वराज्यद्रोही छत्रपतिद्रोही व गाढव ठरविण्याचा मॅनिफेस्टो जाहिर करा, आणि पेशव्याची अगर आधुनिक बोडसकेतकरादि ब्राह्मण विद्वानांची अब चव्हाट्यावर आणण्याचा निस्पृहपणा जर तुमच्यात नसेल, तर शिवकालीन ब्राह्मणांच्या इतिहाससिद्ध पाजीपणावर पांघरून घालण्याचा पाजीपणा करू नका. बापजाद्यांचा मुर्खपणा बिनशर्त कबूल करा किंवा स्वतःचा मूर्खपणा निस्संकोच कबूल करा. याशिवाय या त्रांगड्याचा तिसरा निर्णय लागणे शक्य नाहीं.
कायस्थ प्रभू समाजाच्या शिवकालीन राष्ट्रकार्याला व वीरवीरांगनांना कवडीमोल ठरविण्यासाठी, कायस्थांनी लिहून ठेविलेल्या आद्य बखरींना `खोडसाळ ठरवून, त्यांची महाराष्ट्रेतिहास-विषयक कामगिरी हाणून पाडण्यासाठी आणि एकट्या ब्राह्मणांच्या टाळक्यावर स्वराज्यनाशाचे फुटलेले खापर येनकेन प्रकारेण सर्व ब्राह्मणेतरांच्या, विशेषतः कायस्थ मराठ्याच्या बोडक्यावर अलगज ठेवण्यासाठी अलीकडे जे ब्राह्मणी राष्ट्रीय प्रयत्न सुरू आहेत, त्याचा दृष्य परिणाम श्री. भावे बोडसादिकांच्या लेखांतून प्रगट होत असतो. अर्थात या प्रयत्नांच्या धामधुमीत बाळप्रभू चिटणीसेच्या निंदेवर शिवकालीन ब्राह्मणांची स्वराज्यनिष्ठा, रंगो बापुजीवर पाखडलेल्या आगीत रावबाजींची कर्तबगारी, गागाभट्ट प्रकरणांतल्या कायस्थांच्या खटपटीच्या गाढवपणावर मराठ्यांना कायस्थाविरुद्ध चिथविण्याची राष्ट्रीयपंथ-प्रासादिक नातुगिरी असले प्रकार इतिहास संशोधनाच्या नांवाखाली बेकाम बोकाळल्यास आश्चर्य नाही. कृतघ्नता ही राष्ट्रीय चित्पावन ब्राह्मणांच्या जीविताची जीवनदेवता असल्येमुळे, चिटणीशी कलमाच्या फटकाऱ्याच्या पोटी अखिल चित्पावन समाजाचें सामाजिक अस्तित्व व राजकीय भाग्य जन्माला आले.
ही इतिहाससिद्ध गोष्ट आधुनिकांच्या स्मरणांतून नष्ट होऊन, केवळ पेशवे संप्रदायाच्या स्तोमासाठी त्यांनी बाळ चिटणीसादि प्राचीन पुरस्कर्त्यांवर लाथा झाडल्या. तर त्यांत बिघडलें कोठे? शिवाय सध्या सुरू असलेल्या स्वराज्याच्या राष्ट्रीय शिमग्यांत ही पुणेरी ठाणेरी कुत्री जर सर्रास ब्राह्मणेतरांवर भुंकण्यास काकू करतील, तर त्यांच्या संप्रदायाचा स्वाराज्याभिमान किस उरल्याशिवाय कसा राहील? ब्राम्हणेतरांना स्वराज्यद्रोही ठरविल्याशिवाय ब्राह्मणांची स्वराज्यनिष्ठा प्रस्थापित शक्य नाही.
थोडा खुलासा.
प्रबोधनांत वरील लेखमाला प्रसिद्ध झाल्यावर ठाकर्यांवर अब्रुनुकसानीची घोरपड चढविता येईल किंवा नाही, याबाबद भा. इ. स. मंडळाच्या वार्षिक संमेलन प्रसंगी खासगी बैठकीत बरीच चळवळ सुरू होती. काही पटाईत ब्राह्मण वकीलांची सल्ला घेण्याचीहि जारी खटपट झाल्याचे वृत्त आम्हांला पुण्याहून समजलें होतें. पण त्या वेळी आम्ही त्याची दख्खल केली नाहीं. कायदेबाजीच्या कंचीत ठाकऱ्यांच्या चिंधड्या उडविण्यांत मंडळाला किंवा श्री. भाव्यांना पैशाचा तुटवडा पडणार नाही. श्री. भावे तर काय लाखाधीश आहेत म्हणतात. सातारच्या एका बेगडी श्रीमंत कायस्थ प्रभूने आमच्यावर उभारलेल्या किटाळाच्या सिद्धीसाठी जर आपली लंगोटी खेचली होती तर आमची व प्रबोधनाची मुस्कटदाबी करायला मंडळाभिमानी ब्राह्मण वीरांना कंबरा कसणे फार कठीण मुळींच नव्हतें. तो त्यांच्या हातचा मळ आहे. प्रश्न इतकाच की ठाकरे व्यक्ति तुरुंगांत गेली, ठार मारली गेली किंवा कालमानाप्रमाणे उद्य मरण पावली, तरी तेवढ्याने मंडळाच्या किंवा राजवाडे भावे प्रमृतीच्या कारस्थानांचे आणि कायस्थादि ब्राह्मणेतरांच्या बदनामीचें मंडन ते कसे होणार? इंग्रजांच्या सैतानी राज्याविरुद्ध राष्ट्रीय चित्पावन कितीहि आदळ आपट करीत असले आणि त्यांच्या राज्यशकटाला ढासळून इंग्रेजी कायद्याला न जुमानण्याच्या त्यांच्या वल्गना कितीहि असल्या, तरी कायद्याच्या खलबत्त्यांत एकाद्या ब्राह्मणेतराचा चेंदामेंदा होत असेल, तर आपल्या सर्व वल्गना बासनात गुंडाळून १२४ (अ) व १५३ (अ) ची कायदेबाजी खेळायला त्यांना मुळींच शरम वाटणार नाहीं, हें आम्ही जाणून आहों. शिवाय, जेथे मंडळाचे प्रयत्न कायस्थ प्रभूंना लौकिकदृष्ट्या हीन व क्षुद्र लेखून त्यांचे कायमचे तळपट उडविण्याचे आहेत, तेथे कायस्थ प्रभू ठाकरे कायदेबाजीच्या फांसावर चढला तर हिंदूंच्या अस्तित्वावर उठलेल्या कायस्थ प्रभू समाजांतील एक खटपट्या` व` चळवळचा नाहींसा केल्याची पुण्याई तरी मिळेल! सामुदायिक तळपटासाठी वैयक्तिक छाटबाजी करावीच लागते. एका संबंध समाजाची बदनामी करणाऱ्या शहाण्यांनी स्वतःच्या अब्रूची फाजील किंमत ठरविणे फाजीलपणाचे आहे.
बस् खलास!
****