खरा ब्राह्मण
(संगीत नाटक)
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
दुसऱ्या आवृत्तीविषयी
खरा ब्राह्मण
नवी सुधारलेली रंगावृत्ति
[सन १९४८]
लेखक
केशव सीताराम ठाकरे
(प्रबोधनकार)
महाराष्ट्र ग्रंथ भांडार, मुंबई – ४
किंमत ।। रुपया
प्रकाशक : शंकर वामन कुळकर्णी, महाराष्ट्र ग्रंथ भांडार, गिरगांव, मुंबई ४
मुद्रक : प्र. के. अत्रे, अत्रे प्रिंटिंग प्रेस, वि. प. रोड, गिरगांव, मुंबई ४
या नाटिकेसंबंधी सर्व प्रकारचे हक्क माझ्या स्वाधीन आहेत. प्रयोग करण्यापूर्वी नाट्यसंघानी माझी लेखी परवानगी मिळविणे अगत्याचे आहे.
- के. सी. ठाकरे
अल्प निवेदन
खरा ब्राह्मण नाटिकेला प्रस्तावनेची किंवा जाहिरातीची आता काही जरूरच उरलेली नाही. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाच्या इतिहासात या नाटिकेने निर्माण केलेला खळबळीचा एक छोटेखानी अध्याय सर्वश्रुत नि सर्वपरिचितच आहे. श्रीयुत नंदू खोटे यांच्या रेडियो स्टार्स नाट्यसंघाने ता. १२ एप्रिल १९३३ बुधवारी रात्री १० वाजता, मुंबई येथील बॉम्बे थियेटरात, या नाटिकेचा पहिला आणि लागोपाठ दररोज ७५ प्रयोग केले. पुढे पुणे, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी वगैरे महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी रेडियो स्टार्सनी या नाटिकेचे ५०च्या वर प्रयोग केले. शिवाय, गावोगाव अनेक हौशी नटसंघ गेली १२ वर्षे सालोसाल कितीतरी प्रयोग अखंड करीतच असतात.
पुस्तकाची पहिली पाचहजारी आवृत्ती आता मिळेनाशी झाल्यामुळे, ही दुसरी रंगावृत्ति छापली आहे. रंगभूमीवर प्रत्यक्ष प्रयोग करताना या रंगावृत्तीचा योग्य तो उपयोग व्हावा, अशी आता मांडणी केली आहे.
नर्तिकेच्या पात्राची पुष्कळांना अडचण पडते. म्हणून हिरकणीच्या प्रवेशाऐवजी रंगभूमीवर वठवून पाहिलेले दोन बदलीप्रवेश पुरवणी भागात मुद्दाम छापले आहेत. गावबा नि एकनाथ या पात्रांना दोन तीन नवीन पदे घातली आहेत. केवळ गद्यातच नाट्यप्रयोग करणारांनी पदे गाळली तरी रसहानी कोठेही होणार नाही, असा अनुभव घेतलेला आहे.
माझे स्नेही श्रीयुत नंदू खोटे यांनी नुकतीच आपल्या रेडियो स्टार्स नाट्यसंघाची पुनर्घटना केली आणि महाराष्ट्र ग्रंथ-भांडाराचे मालक श्रीयुत शंकर वामन कुळकर्णी यांनी शुद्ध आपुलकीच्या भावनेने प्रकाशनाचे कार्य पत्करले, म्हणूनच ही रंगावृत्ति रसिकांच्या हाती द्यायचा मला योग लाभला.
नाट्यरसिकांचा कृपाकांक्षी
केशव सीताराम ठाकरे
जोशी बिल्डिंग
रानडे रोड एक्स्टेन्शन, मुंबई नं. २८.
रामनवमी, ता. १० एप्रिल १९४६
अंक पहिला
अंक १ला
प्रवेश १ ला
[पैठण शहरातील श्रीराम-मंदिरात रामनवमीचा उत्सव. स्त्रीपुरुष व मुले देवळात जात आहेत. बाहेर महाद्वारावर पिठू महार व त्याची तरुण विधवा सून सीता उभी आहेत. नांदी चालू आहे.]
नान्दी. (राग – पिलु, ताल - त्रिताल)
उधळि गुलाल यशाचा ।। खुलविशि ।
जनमना सतत नवरस- सिंचनी ।।उधळि. ।।धृ.।।
मानव-तनुच्या रंगभूवरीं ।
हृदयाचे नव पडदे वितरी।
रंगवुनी त्या विविध विकारीं।
सुत्रधार आत्मा नवलाचा ।।उधळि. ।।१।।
तुडवि विषम कल्पना । बुडवि विफल जल्पना ।
फुलवि सदय भावना । खुलवि रसिक सन्मना ।।
स्फुरवित ममता । पसरित समता ।
रमाकान्त सेवक रसिकांचा ।।उधळि. ।।२।।
[नांदी पुरी होताच राम-मंदिरात बार होतात, ‘‘त्रिलोक प्रतिपालक श्रीरामचंद्रजीकी जय’’ असा त्रिवार जयघोष होतो. गुलाल उधळला जातो. टाळ्यांचा कडकडाट. ]
विठू : सीताबाय, बोरी, श्रीरामरायाचा जन्म झाला बरं. (देवळाला नमस्कार करतो.)
सीता : (मनस्कार करते.) मामाजी, आज कित्ती कित्ती युगं लोटली कोण जाणं, दरसाSल देवाच्या रामनवमीचा उत्सव होतो. पण दर खेपेला वाटतं, आजच-आत्ताच-रामराय जन्माला आले. असं काहो वाटतं आपल्याला, मामाजी?
विठू : मुली, ज्यांचा आत्माराम जागा आहे, त्यांनाच असं वाटतं बरं. ज्यांचा आत्माराम निजला आहे, त्यांना दिवसा अंधार नि चालती बोलतीजिती माणसं दगडधोंडे वाटतात. [दूर पाहून] अशी बाजूला उभी राहा. ब्राह्मण देवळात जात आहेत. त्यांच्यावर आपली सावली पडेल.
सीता : सावली? सावली तर आपल्या पायाखाली. अन् त्यांच्यावर कुठून पडणार मामाजी?
[भडाग्नि बोजवारे गीता पुटपुटत प्र. क्र.]
भडाग्नि : (स्व.) यदन्येषां हितं न स्यात् आत्नमः कर्म पौरुषम् । अपत्रपेत वा येत न तत्कुर्यात कथंचन ।। (उ.) अरेच्चा हा महारडा! शिवशील. दूर हो. राण्डलेकानीं अगदी ताळ सोडला. [पंचपात्रांतले पाणी शिंपडीत] रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे । रघुनाथाय नाथाय-सुळावर चढवले पाहिजे रांडेच्याना. (चरफडत जाऊं लागतो, तोच सीता नजरेला पडते. तिला पाहून स्व.) ही कोण? उत्फुल्ल-कमल-वदन, बिम्बोष्टी, कुंजर-गण्ड-स्थळ नितम्बी, सरोज-नयना! वा! याचं नांव पात्र! नाहीतर आमची! वक्रतुण्ड महाकाय-रघुनाथाय नाथाय सीतापतयेनमः (जातो.)
[चव्हाटे शास्त्री पुटपुटत प्र.क.]
चव्हाटे : (स्व.) पुनरपि जननं पुनरपि मरणं । पुनरपि जननी-जठरे शयनम् ।। (उ.) आं! अरे ए धेडा, डोळे आहेत का फुटले? आमचा जाण्यायेण्याचा रस्ता. बटकीच्या, पायरीला अगदीं खेटून उभा आहेस. लाज नाही वाटत. चल हो दूर. (पाणी शिंपडतो.) भजगोविंदम् भजगोपालम् मूढमते. हा सगळा त्या एक्याचा पाजीपणा! गाढवान् सगळा महारवाडा डोक्यावर घेतलाय्. (सीतेकडे लक्ष्य जाताच स्व.) यंवरे यंव! वेलाण्टीनं गोलाण्टी खाल्ली, नाहीतर महारीण होण्याऐवजी महाराणी होण्याच्या लायकीचं पात्र. (उ.) ही कोण रे विठ्या?
विठू : जोहार मायबाप. ही दौलताबादच्या रंगनाक सुभेदाराची मुलगी नि माझी सून सीता, मायबाप.
चव्हाटे : तुझी सून? म्हणजे परवा परनाळ्याच्या लढाईत पडलेल्या त्या तुझ्या रामजी पोराची बायको वाटतं?
विठू : होय जी मायबाप.
चव्हाटे : (स्व.) गारगोटीच्या पोटी हिरकणीच म्हणायची! भज गोविंद भज गोपालं मूढमते. (जातो.)
सीता : मामाजी, हे येणारे जाणारे लोक असे काय हो माझ्याकडं रोखून रोखून पाहाताहेत?
विठू : त्यांना डोळे आहेत खरे, पण सारं जग त्यांना उलटं दिसतं. म्हणून ते असे रोखून पाहतात.
सीता : असं होय?
विठू : मुली, तू आता घरी जा. नीट जपून जा बरं. प्रसाद घेऊन आलोच मी पाठोपाठ. मग आपण दोघेजण उपास सोडू हं, जा.
सीता : लवकर या हं अगदी (जाते.)
[आत सारंग रागाचे सूर घुमू लागतात व‘‘बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथ-नन्दना’’ हा पाळणा गातात.]
विठू : (स्व.) देवाला पाळण्यात घातला. भाग्याचे भक्त रामरायाला पाळण्यात घालून त्याला झोके देत आहेत. बाळा जोजोरे! देवा रामराया, तुझ्या पाळण्याला झोका देण्याचं तर राहिलंच, पण भाग्यवंतांनी दिलेले झोके, डोळे भरून पाहण्याचं भाग्यसुद्धा आम्हा महारा-मांगांच्या कपाळी नसावं ना?--- तुझ्या दर्शनाला आमचा जन्म आडवा यावा? देवा, तू निर्गुण, निराकार, हीन दीन दुबळ्यांच्या उद्धारासाठी सगुण साकार झालास, तरीसुद्धा तुझं सावळं ढवळं रूप आम्हा अभाग्यांच्या डोळ्याआड केलंस? भगवंता, भाग्यवंतांनी दगडधोड्यांच्या देवळात तुला दडवून ठेवला; पण रामा, आम्हा दीनदुबळ्यांच्या दिलाच्या देवळात तर तू आहेसना! [पुन्हा पाळण्याचे थोडेसे स्पष्ट शब्द, नंतर नुसता तंतुवाद्याचा कोमल ध्वनि, विठू त्या सुरावर डोळे मिटून ताल धरतो.]
[भंपकराव भोजने व म्हादबा पाटील प्र. क.]
भंपकराव : (विठूला पाहून) म्हदबा पाटील, याचं नाव भक्ति बरं, वाहवा! भाताला चोपडलेल्या केशरी रंगाप्रमाणं, हा रामभक्त भक्तिरंगात अगदी एकतान रंगला आहे.
म्हादबा : माळकरी दिसताया. व्हय, हायेच की त्येच्या गळ्यामन्दि अशी तुळशीची माळ. माळकरी म्हंजी आमचा सगा बरका भंपकराव. मग काय बि भेदभाव न्हाय. जात न्हाय न् पात न्हाय. निवरतीच्या ग्यानबा द्येवान् आमा गोरगरिबांच्या गळ्यामन्दी ही तुळशीची माळ, हातामन्दी भजनाचा टाळ, अन् पायामन्दी चाळ आडकवूनशान लइ उपकार केलाया, पगा, लइ उपकार केलाया.
भंपकराव : ज्ञानेश्वरानी भागवत धर्मचा पाया रचून, ब्राह्मणेतर गोरगरीब जनतेला मोक्षाचा एक नवीन दरवाजा उघडला. म्हादबा पाटील, पूर्वी आम्ही ब्राह्मण मराठ्यांनासुद्धा शिवत नव्हतो, मग पाणी पिण्याची गोष्ट कशाला? पण आता आम्ही खुशाल तुमच्या ओटीवरू बसून पान तम्बाखू फाकतोच की नाही? ही सुधारणा ज्ञानोबांनी केली. फार थोर पुरुष! पुरा अन्तर्ज्ञानी!
म्हादबा : अक्षी बराबर, बामनाचा बोल, कोन करनार त्येचं मोल! ग्येनबा द्येवान् मराठई बोलीमन्दी घेणेसरी ल्हेऊनशान, उभ्या मर्राठ देशावर माळकऱ्यांचा मेळा मस्त पिकावला पघा-लइ मस्त. ज्कड पघाल तक्ड माळ न् टाळ-टाळ न् माळ. पण्डरीच्या इण्डुबाचा नामघोस, सताड गंगेवानी वाहताया. नामाचा मळाच पिकवला जनु. जवारीच्या मळ्यात जसी उमाप कनसं डुलत्यात, तशी या नामाच्या बाजारामन्दी मस्त माणसं कनसापरमान अशी डुलत्यात, खुलत्यात अन् तानभूक बि भुलत्यात.
[आतील तंतुवादन बंद होते.]
विठू : (डोळे मिटून स्व.) कुळभूषणा, दशरथनंदना, रामा! या अभागी विठ्याचा कुळभूषण राम-माझा बचडा रामजी – बाळा, आता कुठं रे तुला पाहू. माझ्या दिलाच्या शिलेदारा! धर्मासाठी, देशासाठी देवाSS, तुझ्या देवळाच्या दौलतीसाठी महिना झाला! – पर्नाळ्याच्या वेढ्यात पडला. पाळणा हालतोय, हालतोय रामाचा पाळणा, रामा – विठ्याच्या पोटच्या गोळ्या, माझ्या काळजाचा पाळणा असाच कारे जन्मभर हालत राहणार!
[‘रघुपति राघव राजाराम’ भजन आत गायले जाते. विठू ताल धरतो.]
भंपक : सम्हादबा, चुरम्याच्या लाडवासाठी कणकेचे रोठ जसे कंबर मोडमोडून कुटतात, तसा हा रामभक्त, भक्तीच्या उमाळ्यानं एकसारखा टाळ कुटीत आहे. गरम गरम जिलब्यांची वेटाळी पंक्तीत वाढताना ठसकेदार वाढणारणीच्या नाजूक बोटावरून पाकाचे ताट जसे टिबकतात –
[गावबा प्र. क.]
गावबा : आन् आपल्या बोटाऐवजी तिचीच बोटं हात धरून चुखावीशी वाटतात.
भंपक : तसे याचे डोळे, गावबा, भक्तिरसानं सारखे पाझरत आहेत.
गावबा : थरकत घोडा. भडकत निशान, अठरा बरनके राज महाराज.
भंपक : खरोखर, आपल्या धर्मासारखा धर्म जगाच्या पाठीवर एकसुद्धा नाही.
गावबा : तुमच्या पोटातच धर्म बसल्यावर जगाच्या पाठीवर तो दिसणार कसा? थरकत घोडा, भडकत निशाण.
भंपक : राज्यकर्ते मुसलमान, म्हणून त्यांच्या इस्लामी धर्माच्या बढाया फार. पण आमच्या धर्मातली मज गोडी अन् लज्जत त्यात नाही.
म्हादबा : वाईच पुन न्हाई पघा.
गावबा : येईल कुठून? थरकत घोडा, भडकत निशाण, ज्या धर्मात शेण्डी नाही, जानवं नाहही, शेण गोमुत्र नाही, बहिष्कार नाही, प्रायःश्चित्त नाही, विटाळ नाही, भजन नाही.
भंपक : ब्राह्मण - भोजन नाही.
गावबा : हो. तो कसला धर्म! छे, मला कुणी जबरीनं मुसलमान केलं, तरी मी मुसलमान होणार नाही, भंपकराव
भंपक : ए, झालास तर आमच्या सनातन धर्माचा काही जीव जाणार नाही.
गावबा : तेवढीच काय ती भीती.
म्हादबा : वगावबा, जवार आपली बामनं खबरदार हायती, तवार आपल्या धर्माचं कायबी वंगाळ व्हनार न्हाय पघा.
भंपक : म्हादबा, सगळे हिंदु जरी निजमाशा बहिरीसारखे मुसलमानी धर्मात गेले, तरी आमच्या सनातन धर्माचा रोमसुद्धा वाकडा होणार नाही.
म्हादबा : न्हाय व्हनार, न्हाय व्हनार, न्हाय व्हनार, बामनं हायती तवार काय बी व्हनार न्हाय.
भंपक : हिंदुधर्म म्हणजे काय थट्टा समजलास?
गावबा : थट्टेचा धर्म नसेल, पण धर्माची थट्टा झाली नाही, म्हणजे थरकत घोडा, भडकत निशाण.
भंपक : ते काही चटकन भिजवून पटकन तळणाला काढलेलं अनारशाचं कच्चं पीठ नव्हे. चांगलं दहा हजार वर्षांचं तिम्बवण आहे.
गावबा : तरीच वैदिक अनारशांचा घाणा उतरल्यावर उरल्या पिठाचे इस्लामी मालपुवे होतात.
भंपक : गावबा, आपला धर्म फार उदार, फार मोठं पोट त्याचं!
म्हादबा : लई म्होटं प्वाट! बामन बोलत्याति.
गावबा : जसा काही मूरतुजा निजामशहाचा पाण्ढरा हत्तीच. थरकत घोडा, भडकत निशाण.
म्हादबा : आपला धरम म्हंजी योक हत्तीच हाय पघा.
गावबा : तरीच बेट्याचे खायचे दात निराळे न् दाखवायचे दात निराळे.
लावणी
ब्रह्मदेवाचा बाप भट बनला जी ।
झाली धर्माची पातळ भाजी ।।धृ.।।
चार वर्णांच्या चार कोट जाती ।
क्षत्र वैश्यांची केलि चिकणमाती ।
शूद्र दुनियेचा बामण गाजी हो ।।झाली.।। १।।
देव राहिला पल्याड । बामण राजा अल्याड ।
त्याचं लागलं लिगाड । जो तो भीतो
भटा करतो जी जी ।।झाली.।।२।।
भंपक : गावबा, अझून तू पोर आहेस.
गावबा : पोर? आई म्हणते तू घोडा आहेस. थरकत घोडा, भडकत निशाण,
[आत] रघुपति राघव भजन, विठू ताल धरतो.]
म्हादबा : त्यो पघा, लई उमाळ्यान् भजान करताया. चला त्येचं दरशाण घेऊ. त्योबि माळकरी अन् म्याबि माळकरी. (‘‘पुण्डलीक वरदा हाS Sरि इण्टाSल’’ म्हणून म्हादबा विठूच्या पायावर डोके ठेवतो. विठू दचकतो. उलट पाया पडतो.)
विठू : मायबाप, काय केलंत हे! मी माळकरी खरा पSण ----
म्हादबा : माळकरी म्हंजी सगा.
गावबा : (म्हादबाला हळूच) पण जातीचा आहे ना दगा. आता तुमचं तुम्ही बघा.
म्हादबा : (गावबाला हळूच) आरं या माळेनं फोडला जातीचा फुगा, ऱ्हा गुमान उगा.
भंपक : रामभक्ता, तू धन्य आहेस.
विठू : धन्य? मी कसचा धन्य. जन्माला येऊन प्रभू रामरायाचं दर्शनसुद्धा या अभाग्याला नाही. मी कसचा धन्य!
भंपक : तू आन्धऴा का आहेस ?(विठू नकारची मान हालवतो) नाही ना ? मग देवदर्शन घ्ययचं तर देवऴात जा.
म्हादबा : देवऴात जा. बामनं बोलत्य़ात-देवऴात जा.
गावबा : म्हादबा बि म्हंगत्यात, देवळात जा. हूं! थरकत घोडा, भडकत निशाण.
विठू : देवळात जाऊ? देवळात कसा जाऊ?
भंपक : देवळात कसा जाऊ? वेडाच दिसतो. अरे पायांनी चालत जा.
गावबा : नाही तर डोक्यानी चालत जा.
विठू : डोकी चालती, तर ही दशा कशाला असती. भक्त असून द्वदर्शनाला नि माणूस असून माणुसकीला मुकलेला मी एक अभागी आहे. मायबाप, गरीबावर थोडी दया करा. रामरायाच्या गळ्यात हा फुलांचा हार घाला. हा कापूर पेटवून देवाला आरती करा, अन् परत येताना देवा ब्राह्मणांचा उरला सुरला प्रसाद घेऊन या.
गावबा : (स्व.) भंपकरावाच्या भगदाडातून वाचला तर!
भंपक : अगत्य अगत्या. दे तो हार न् कापूर. वाहतो नेऊन देवाला (स्व.) माझी आयतीच सोय झाली.
[विठूला शिवून त्याच्या हातचा हार न् कापूर घेतो. इतक्यात भडाग्नी व चव्हाटे देवळाबाहेर येतात व हा शिवाशिवीचा प्रकार पाहून मोठ्याने ओरडतात.]
भडाग्नी व चव्हाटे : अब्रह्मण्यम् अब्रह्मण्यम्! हे काय, हे काय! अहो भंपकराव महार, भंपकराव महार!
गावबा : भंपकराव महार? – काय झालं हो बाप मेल्याइतकं ठणाण बोम्बलायला? काय देऊन पेटलं, का घराला आग लागली?
भडाग्नी : धर्माला आग लावलीन् या भंपकरावान.
चव्हाटे : भंपकराव, महाराच्या हातचा हार शिवून घेतलास?
भंपक : हा हार महाराच्या हातचा? विष्णवे नमः [हार फेकून देतो. टाणकन् उडी मारून दूर जातो.] काय रे म्हादबा, हा म्हार कायरे? अन् गाढवा, त्याला तू शिवलास?
म्हादबा : (स्व.) पंचाईतच झाली! आता कसं करावं (उ.) आSSर इचिभन्! ह्यो कोन म्हार व्हय?
गावबा : (स्व.) भटाला बिचकला हा टाळकुट्या! (उ.) म्हार असला म्हणून काय झालं! माळकरी माळकरी सगा.
म्हादबा : माळकरी असला म्हून? आम्ही मर्राठं. म्हाराला शिवून काय धरम बुडवायचा? बामनं काय बोलत्याल? धुःत तिझ्या जिंनगानीवर मर्दा. मला इण्टाळ केलास व्हय?
भडाग्नी : विटाळ झाला तुम्हाला भंपकराव. रामनवमीचा दिवस – उपवास --
गावबा : आणि भरल्या पोटी विटाळ? थरकत घोडा भडकत निशाण.
चव्हाटे : सचैल स्नानाशिवाय तुम्हाला सुटका नाही. ब्राह्मण म्हणवता आणि महाराला शिवता? काय सगळी थट्टा समजता? हे पैठण आहे पैठण.
गावबा : गावठम नाही, पैठण आहे, समजलात? निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, या संन्याशाच्या कारट्यांना जन्मभर मसणवटी दाखवणाऱ्या धर्ममार्तंडांचं हे पैठण. थरकत घोडा भडकत निशाण.
म्हादबा : (स्व.) म्हारडा लइ एडपा. घुसायचं देवळात. कोन वळाकत्?
भंपक : म्हादबा, खूप अक्कल पाघळलीत.
म्हादबा : म्या काय केलं भंपकराव.
भंपक : अकलेच्या कांद्या, सगा म्हणून तू या गाढवाच्या पाया पडलास, म्हणून मराठा समजून याला मी शिवलो न हार घेतला. (विठूच्या अंगावर धावून जातो.) गाढवाच्या लेका, महारडा कारे तू? लाज नाही वाटत?
विठू : जन्माची नि जातीची कसली लाज? जोहार मायबाप जोहार, सूर्यवंशी रामाजी बाजीचा मी महार, तुमचे गावचा वेसकर खबरदार, धन्याच्या रजेने सारा कारभार, करतो की जी मायबाप.
भंपक : चुलीत गेला तुझा मायबाप, मसणातल्या म्हसोबा हे आधी सांगायला तुझं तोंड काय हुण्डलं होतं?
गावबा : आणि भंपकराव, तुमच्या डोळ्यावर सडक्या रताळ्याचा कीस बांधला होता, कुझक्या भुइमुगाची भगर थापली होती, का नासक्या केळ्यांची लोंगरं लटकली होती हो? थरकत घोडा, भडकत निशाण.
भंपक : गावबा, तू सुद्धा उलटलास कारे?
गावबा : उलट्या जगात उलटू नको, तर काय सुलटा चालून सालटे सोलवून घेऊ? थरकत घोडा भडकत निशाण, भंपकरावांची दाणादाण.
भडाग्नी : चला गंगेवर जाऊन प्रायःश्चित्त घ्या.
चव्हाटे : सचैल स्नान करून पंचगव्य घ्या, जानवे बदला ---
गावबा : शेंड बदला --
चव्हाटे : अन् व्हा मोकळे.
गावबा : चला गंगेवर नेऊन गंगाराम न्हाव्याकडून सक्षौर मोकळे करवतो. उपासाच्या दिवशी भरल्या पोटी विटाळ झाला. आधी चांगली खळखळून बस्ती घ्या. नाही तर धोब्याच्या भट्टीत कोठ्या धुवून आणा.
विठू : मायबाप, मी पंढरीनाथाचा माळकरी आहे. शाकाहारी आहे. तुमच्यासारखा तुमच्याइतका स्वच्छतेनं राहतो. मग माझ्या नुसत्या हाराचा स्पर्श तुम्हाला कसा बाटवतो मायबाप?
भंपक : स्पर्शच काय, नुसती सावली नाही आम्हाला खपायची म्हारड्या.
गावबा : आमचा हिंदुधर्म फार उदार! फार मोठं पोट त्याचं! असंच ना हो भंपकराव?
म्हादबा : आरं टाळमाळीच्या, म्हर्राट्याना न्हाय तुझी सावली खपायची तर बामनांना रं कशी खपनार मैन्दा?
गावबा : अहो म्हादबा पाटील, तुमच्य गेनबाच्या भआगवत धर्मात तर जातपात नि विटाळ मानीत नाहीत. ज्याच्या हाती टाळ, त्याचा फिटला विटाळ, मग आताच तुम्हाला कसा विटाळाचा पान्हा फुटला हो?
म्हादबा : इण्टाळ हाय न् न्हाय. धर्मांत मस्स लिवलय. पन बामनं काय बोलत्याल?
गावबा : बामनं काय बोलत्याल! पंढरीचे टाळकुटे न् गंगेतले गोटे, छान जमले साटेलोटे! बामनं काय बोलत्याल!
भंपक : म्हादबा पाटील, तुझ्यामुळं राण्डलेका या क्षेत्रस्थ पंडितावर आंघोळीची पाळी आली.
(एक फकीर आत दोहा ललकारतो.)
जिन आपकू धोया नहीं । तनमनसे खोया नहीं
मनमैल को धोया नहीं । आंघोल किया तो क्या हुवा ।।
अल्लाके प्यारे । तेरे नगरीमें बोलता है कौन ।।
भडाग्नी : (बिकट हास्यमुक्त थट्टेने) आंघोल किया तो क्या हुवा! (चव्हाटे हास्याचा दुजोरा देतो.)
गावबा : अहो भडाग्नी, अहो चव्हाटे, ‘मनमैलको धोया नहीं. आंघोल किया तो क्या हुवा’ कळतं का काही कळतं?
चव्हाटे : महिन्या महिन्यात यांची न् पाण्याची भेट नाही नि म्हणे आंघोळ किया तो क्या हुवा.
म्हादबा : आसं कवा झालया राव. अंगोळी धवल्या बिगार कन्दि कोन सूद झालाया? बामनं काय बोलत्याल?
भडाग्नी : हे फकिरी तत्त्वज्ञान ब्राह्मणाला काय होय! भंपकराव भोजने स्नान करून प्याश्चित्त घेत नसाल, तर वाळीत पडावं लागेल.
चव्हाटे : हे पैठण आहे पैठण, समजलात?
गावबा : वाळीत पडावं लागेल, काळीत रहावं लागेल, जाळीत बसावं लागेल. विचार करा. थरकत घोडा भडकत निशाण.
चव्हाटे : महाराला शिवलात. महार झालात. आता कोण तुम्हाला ब्राह्मण मानणार?
गावबा : अहो चव्हाटे, ब्राह्मण महाराला शिवला तर तो महार होतो. पण महार जर एकाद्या ब्राह्मणाला शिवला तर तो ब्राह्मण होईल का हो?
चव्हाटे : आचन्द्रार्क असं घडणार नाही.
म्हादबा : असं कसं घडल गावबा, आसं कसं घडलं. याद काय लिवत्यात. बामनं काय बोलत्यात.
चव्हाटे : एकाच धातूची निरनिराळी पात्रं असली तरी रामपात्राची योग्यता कुणी शौचपात्राला देत नाही. हा विठ्या-महार, म्हणजे शौचपात्र. त्याचा हार ब्राह्मणांनी हातात घ्यायचा?
भडाग्नी : महत्पाप महत्पाप! अब्रह्मण्यं.
गावबा : बामनं तेवढी रामपात्र, बाकीचे तुम्ही सगळे शौचपात्र. पटतं का पाटील तुम्हाला?
म्हादबा : बामनं बोलत्याती गावबा. करायचं काय! यदाज्ञा म्हणजे देवाज्ञा.
गावबा : (स्व.) तुझ्या अकलेला झाली खरी देवाज्ञा.
विठू : मायबाप, महाराजा विटाळ असला, तरी त्या हाराला कसला देवा विटाळ? देवाघरची मुलं, तशी हो मोगऱ्या गुलाबाची पाक फुलं, मुलाफुलांना, मायबाप कसली जातपात, विटाळ न् चाण्डाळ? गंगामाईचं पाकपाणी, देवावर घालावं, अठरापगड जातींनी घ्यावं, आन् जीवन्मुक्त व्हावं.
चव्हाटे : महारडा तर महारडा अन् आम्हाला ज्ञान शिकवतो? थोबाड फोडीन--- (अंगावर धावून जातो.)
गावबा : (त्याला अडवून) हां हां हां शास्त्रीबुवा. थोबाड फोडाल तर विण्टाळ होईल, आन् सारा गंगेचा ङाट विटाळ्या शास्त्र्यानी भरून जाईल. थरकत घोडा भडकत निशाण.
म्हादबा : बामनास्नी गिन्यान शिकावतू? आर ह्यो मनुक्षे मुंजूबा का म्हसूबा?
विठू : मायबाप, मला वेसकराला कसलं आलंय ज्ञान. तुम्हा संताचे चार उष्टे बोल पडतात कानावर, इतकंच.
म्हादबा : बामनावानी सुपास्ट बोलनं घावलं, म्हंजी काय बामनाची अकूल येताया व्हय! मुर्दाड खावा खावूनशान ही म्हारं लई मुर्दाड झाली पघा.
विठू : मायबाप, मुर्दाड जन्माच्या मुर्दाड पापानं देवदर्शनाला मुकलो. पण गंगेवाणी निर्मळ फुलांचा हा हार तरी माझ्या रामरायाला पडू द्या कि मायबाप. महाराचं पाप हाराला का चिकटवता?
चव्हाटे : महाराचा हार देवाच्या पायावर?
भडाग्नी : देवळाच्या पायऱ्यावर नाही पडायचा, तर देवाच्या पायावर? पाजी.
गावबा : पाजी नाही तर काय. देवाच्या गळ्यातला हार घटकेच्या आत, आनंद बाजारांतल्या गमनाजी जमनाजीच्या बुचड्यावर चढेल. पण महाराचा हार? थरकत घोडा भडकत निशाण.
भंपक : ए गावबा, बस कर तुझा तो थरकत घोडा भडकत निशाण. आज देवळात हार गेला, उद्या महार जाईल. मंदिर-प्रवेश मिळाला की भोजनाच्या पंक्तीचा हट्ट न् पाठोपाठ लग्नासाठी आमच्या पोरींचा हात धरतील घट्ट.
म्हादबा : बामना अदुगर म्हर्राठ्यांच्या पोरीवर टाकत्याल ही म्हारं हात ---
भडाग्नी : आणि सनातन धर्माचे पडतील बत्तीस दात.
गावबा : लग्नासाठी हात धरायला ब्राह्मण मराठ्यांच्या मुली म्हणजे मण्डईत मांडलेल्या कोंबड्या का लिलावातल्या हण्ड्या बांगड्या? हवी त्याने हवी ती उचलावी व लम्बे करावी. भंपकराव, तोंड आहे का घोड्याचा तोबरा?
विठू : (गावबाला) मायबाप, या अभागी महारासाठी कशाला येता यांच्याशी वर्दळीवर.
भंपक : महारड्या, तोंडाशी तोंड कशाला देतोस?
गावबा : तोंडाला तोंड देण्याची तुमची रामपात्रे फुलपात्रे आनंदी बाजारात आहेत. हे या शौचपात्राला काय माहीत? हा महारडा! थरकत घोडा भडकत निशाण.
चव्हाटे : त्या पाजी एकनाथाच्या पाठबळानं ही म्हारडी अलीकडं फार शेफारली.
विठू : का उगाच सन्ताची निंदा करून जीभ विटाळता मायबाप.
भडाग्नी : संत? तू संत का तुझ्या एक्या संत?
विठू : आपण सगळे आमचे संत. तुमच्याशिवाय आमचा उद्धार कोण करणार? मायबाप, आम्ही हीन दीन दुबळे. जन्माचे अडाणी. पंढरीरायाचे माळकरी. हिंदुधर्माचे कडवे अभिमानी. शेकडो वेळा आमच्या तरण्याजवान महार-मांग बाण्डानी समरांगणावर प्राण देऊन, हिंदू धर्म राखला. नुकताच या अभागी विठ्यानं आपला पोटचा गोळा रामजी परनाळ्याच्या लढाईत बळी देऊन, स्वतःचा निर्वंश करून घेतला, मायबाप, आपण आम्हा दुबळ्यांचे धर्मबंधू, मग आमचा इतका तिटकारा का करता देवा? आम्हा रक्तपित्यासारखं का वागवता? आम्ही माणसं आहोत. आम्हाला थोडं माणुसकीनं वागवा. यापेक्षा अधिक आम्ही काही मागत नाही. देव सगळ्यांचा एकच. तुम्ही सगळे भाग्यवंत देवळात जाऊन देवाचं दर्शन घेता. त्याच्या भजन-पूजनाचा आनंद लुटता -
भंपक : म्हणजे तुला काय देवळात जाऊ द्यायचा?
विठू : कोण म्हणतं तसं मायबाप.
गावबा : अरे बाबा, या देवळात लूत झालेली कुत्री-मांजरं जातात. घाणेरड्या रोगांनी सडलेले शेकडो संभावित जाता. मुंग्यांना साखर चारून माणसांच्या मुंड्या मोडणारे नगरशेट जातात. गोमुखीत हात घालून आनंदी बाजाराची वारी करणारे वारकरी जातात. घरांगना जातात. वीरांगना जातात, वारांगना जातात ---
विठू : पण माझा गरिबाचा फुलांचा नुसता हारसुद्धा रामरायाच्या पायापर्यंत जात नाही! तो असा धुळीत पडतो! बापहो, विचार करा --- विचार करा --
भंपक : तुझा हा हार मी असा पायाखाली तुडवून टाकतो. [लाथ वर उचलतो इतक्यात विठू हार उचलून पोटाशी धरतो.]
विठू : महाराला तुडवा, पण देवाच्या हाराला तुडवू नका मायबाप.
भडाग्नी : किती मदोन्मत्त महारडा हा. दीड दमडीचा हार, पण तो सुद्धा तुडवू देत नाही आम्हाला.
विठू : प्राण गेला तरी देवाच्य हाराला कोणाचा पाय लागू देणार नाही.
चव्हाटे : म्हादबा, अहो तुम्ही शूर मराठे, वारकरी न धारकरी. महारानं ब्राह्मणांचा अपमान करावा आणि तुम्ही तो उघड्या डोळ्यांनी पहावा?
म्हादबा : मैन्दा, बामनांचा पानोतारा करतुस व्हय? ह्या म्हादब्याशी गाठ हई. दण्डुक्यानं टक्कुरं फोडीन. टाक त्यो हार खाली-टाक-टाक-
विठू : महार खाली पडेल, पण हार पडणार नाही.
भडाग्नी : ब्राह्मणाची निंदा? म्हादबा, पाहता काय, तुडवा—लोळवा—
भंपक : ठोका जमीनदोस्त करा.
चव्हाटे :
म्हादबा : (स्व.) काय करावं इचिभन! बामन सांगत्यात! ठोकतोच या म्हारड्याला.
[म्हादबा काठीचा तडाखा मारून विठूला घायाळ करतो. कपाळावर मोठी जखम होते. ‘‘अयाई’’ करीत रक्तबंबाळ विठू झीट येऊन पडतो. सर्वजण घाबरतात. ब्राह्मण दुरून विठूची पाहणी करतात.]
चव्हाटे : कायहो म्हादबा, हा काय अनर्थ केलात?
म्हादबा : म्हजी?
चव्हाटे : असे म्हजी म्हजी काय करता? वेसकर म्हाराचा खून. प्रकरण फार जड जाईल म्हादबा.
गावबा : बामनं काय म्हनत्यात म्हादबा?
म्हादबा : अब असव्ह काय करता बामनानू. तुम्ही समदं म्हंगालात ‘‘ठोका येला.’’ म्हून म्या ठोकला.
गावबा : त्यात तो मेला. आता सुळावर कोण चढणार? म्हादबा का बामनं?
भंपक : म्हणजे? विठू महार मेला का काय?
गावबा : ठार मेला. गार झाला. भंपकराव, महार मेला, विटाळ गेला. खुशाल आता सगळे घरी जाऊन पुरणपोळ्यावर उपास सोडा. गंगेवरच्या प्रायश्चित्ताची आता गरज नाही. अखेरच्या प्रायश्चित्तासाठी चावडीवर जाऊन मी या खुनाची वर्दी देतो. म्हादबा, बामनं का म्हनत्यात? संभाळून असा. थरकत घोडा भडकत निशाण. (जातो.)
भंपक : या अनाडी मरगठ्यानं केला खून. जाईल आता राण्डलेक सुळावर. भडाग्नि, चव्हाटे, चला. या म्हादबाच्या नादाला लागून धर्म करता कर्म पाठीस लागायचे.चला (जातो.)
चव्हाटे : या विकत श्राद्धाचं फुकट तर्पण करतो कोण लेक. [भडाग्नीसह जातो.]
म्हादबा : (स्व.) लइ वंगाळ झालया. आSSर जानविच्यानू. पावण्याच्या टाळक्यान् इचू ठेचुनशान पलता व्हय? आता मला उमगला तुमचा कावा. भावावर भाव घालून, उलटा हे. चोर साव म्हून गावामदी फिरत्यात. गावातल्या समद्या भानगडी ह्येच ह्येच करत्यात, आन् म्हराट्यावर म्हराटा न्हायतर म्हार घालून, दानं टाकून कोंबड्याच्या झुजा खेळतात. आन् सवता मातूर झटाक् उपरणं झटकून फटाक् निसटल्यात. पन म्हंगावं, आता या म्हादबा पिळवण्याशी गाठ हाई! आक्षि तरकातल्या उसापरमान पिळूनशान चिप्पाSSडं करतो या समद्यांची. (तडफडत जातो.)
विठू : (अर्धवट सावध होतो) आई-आई-कुठं आहे मी. आई-पंढरीचे विठाबाई-बये, तुझ्या नावाची माळ घातली, सारा भरिभार तुझ्यावर टाकला. सारी हयात तुझ्या पायाची भक्ति केली. जोगवा मागितला. पायी वाऱ्या केल्या. अखेर बया माझ्या संसाराच्या कवड्या झाल्या! दहा वर्षं झाली. महारवाड्याच्या आगीत जन्माची सोबतीण जळून मेली. तरी, एकुलत्या एका पोराच्या संसाराकडं पाहून आनंद मानला. तोही माझा रामजी-रामजी-देशधर्म देवासाठी-परवा-लढाईत मर्दाच्या मरणानं मोक्षाला गेला. माझी अश्राप पोर सीता, बये, रंडकी झाली. तिचे चुडे वाढवून तुला भरले न् तिच्या कपाळाच्या कुंकवानं, बये, तुला घवघवीत मळवट भरला! [जखमेच्या रक्तानं भरलेला हात पाहून] घाव मर्मी बसला! अबबब, रक्ताचा पाट थांबत नाही. वाहू दे बये वाहू दे, या पापी महारड्याच्या रक्ताचा पाट असाच वाहू दे. सारी दख्खनची जमीन आम्हा महारमांगांच्या रक्तांनी चिंब भिजल्याशिवाय, बये महालक्ष्मी, माणुसकीचं बियाणं इथं नाही रुजणार. जगदम्बे, तुझं रासन्हाणं पुरे होणार नाही अन् आम्हा माणशी जनावरांना माणुसकीनं कुणी करवाळणार नाही! आई-आई, मात्र मी वाचत नाही. पोरी सीते, तुझा मी घात केला. या विठ्या कसायानं तुझा गाईआताचा गळा चिरला. तुला या दगडी काळजाच्या अफाट जगात एकटी सोडून मी जाणार!--- पण सीताबाय, तू एकटीच अभागी नाहीस. तुझ्याबरोबर अडीच तीन कोट अस्पृश्य जीव, माणुसकीच्या पाण्याच्या घोटासाठी शेकडो वर्षं टाहो फाडीत आहेत! – आई, आई, पंढरीच्या विठाई मावली, या विठ्या महाराचा बळी घेऊन ती बये आता सन्तुष्ट हो. आज शेकडो वर्षे – बया – आम्ही अनाथ, दुबळे तुझ्या नावानं धाय मोकलीत आहोत, कशी बये दिलाचे दरवाजे घट्ट लावून तू निधोर बसली आहेस! बयाSS आताकिती अंत पाहणार! आता अखेर झाली. कडेलोट झाली. आमच्या माणशी जनावरांच्या किंकाळ्या ऐक, बया ऐक. जितेपणीच झालो आम्ही ठार – आता उघड बया दार. बयाSS दार उघड.
दार उघड बया । दार उघड बया ।।धृ.।।
हरिहर तुझें ध्यान करिती । चंद्रसूर्य कानीं तळपती ।
गगनीं तारांगणे रुळती । तेवीं भांगी भरले मोती ।।बये.।।
बया त्वां रणकुण्ड जबढा पसरला । रणवाद्य दुंदुभी दण् दण्
दणकला । रथ घोडे कुंजर तुला । तारळे बया अर्पिली ।।२।।
रक्त वाहे भडभडा। तेचि तेल तूप जळे धडधडा ।
पापांचा जुलमी अन्याय-रेडा । शेवटी आहुती घे त्याची ।।३।।
(पुजेचे तबक घेतलेली गिरजाबाई कावरीबावरी प्र. क.)
गिरजा : (स्व.) कुणाची किंकाळी ही? इथंच कुठं तरी जवळ ऐकू आली. शब्द चांगला ओळखीचा वाटतो.
विठू : (शेवटच्या वाताच्या झटक्यात)
दार उघड बये । दार उघड बये ।।
अलक्षपूर भवानी । दार उघड बये ।।
माहुरकर भवानी । दार उघड बये ।।
कोल्हापूर भवानी । दार उघड बये ।।
तुळजापूर भवानी । दार उघड बये ।।
पंढरपूरच्या भवानी । दार उघड बये ।।
गिरजा : कोण ते? विठूबाबा, विठूबाबा (हातातले तबक फेकून देऊन जवळ जाते.) काय झाले?
विठू : (उमाळ्याने, डोळे फिरले असताना) कोण ते? आहा! माझी महालक्ष्मी आली? विठाई आली? आहाSSS
जगदम्बा प्रसन्न झाली । भक्ति कवाडे खडाड उघडली ।
शंख चक्रांकित शोभली । कोटि चंद्र सूर्य प्रभावे बाळी ।
एका जनार्दनी माऊली । कृपेची कराया सावली ।
धावलीस का बये । धावलीस का बये ।।१।।
गिरजा : विठूबाबा, मी महालक्ष्मी नाही. मी गिरजा.
विठू : माझ्या एकनाथ सरदारांची गिरजा?
गिरजा : विठू बाबांची मुलगी गिरजा. गंगेच्या डोहात बुडाली असता जिवाची तमा न करता उडी घेऊन जिला आपण जीवदान दिलंत ती मी तुमची धर्मकन्या गिरजा नव्हे का विठूबाबा? असे डोळे काय फिरवताऩ आन् हा रक्ताचा पाट कसला? [जवळ जाऊन शिवू लागते.]
विठू : (दूर सारण्याचा यत्न करतो.) नको नको. गिरजाबाय-गिरजाबाय-नको नको. या विट्या म्हाराला तू शिवू नको.
[गिरजा शिवते व त्याचे डोके मांडीवर घेऊन पदराने कपाळाचे रक्त पुसू लागते.]
विठू : बये तू रामदर्शनाला आलीस न् कशाला मला अभाग्याला शिवलीस?
गिरजा : मला विठूबाबा भेटले-हेच माझं रामदर्शन. (पदर फाडून जखमेवर पट्टी बांधते. रक्त थांबत नाहीसे पाहून) अगबाई! सगळा पदर भिजून चिंब झाला तरी रक्त थांबत नाही – काय करू मी आता! – विठूबाबा काय झालं हे असं?)
विठू : गिरजाबाय, हे रक्त नाही. रामजन्माच्या उत्सवाचा हा गुलाल आहे गुलाल.
गिरजा : छे! काही तरी सांगता विठुबाबा. कुण्या मेल्या चांडाळानं माझ्या बाबांना मारलं, त्या मेल्याच्या हाताचे कोळसे होतील.
विठू : बये बये, कुणाला शाप देऊ नकोस. माझ्या रामजीनं लढाईत रक्त सांडून पैठणच्या देवदेवळांचं न् हिंदु धर्माचं रक्षण केलं. या विठ्यानं आपल्या अडीच कोट जातभाईंच्या वतीनं, रामरायाला रामनवमीचा फुलवरा चढवताना हा पाहिलास हार-माझ्या सीतेन् मुद्दाम गुंफलेला हार- माझ्या रक्तानं कसा लालेलाल रंगला आहे तो!
गिरजा : अगंबाई! साराहार रक्तानं माखलाय.
विठू : बये, महार भंगला, पण माझ्या पोरीचा हा हार नाही भंगला. लालेलाल रंगला.
गिरजा : पण तुम्हाला मारलं कुणी? ही जखम कशानं झाली? सांगा सांगा – मला घेऊ येऊ लागली. नाही हा रक्ताचा पाट आता मला बघवत. (डोळे मिटते.)
विठू : [खेदयुक्त विकट हास्य] आज शेकडो वर्षे पांढरपेशांनी आम्हाला जनावरासारखं राबवून, काळाजाला पाडलेल्या शेकडो जखमांपेक्षा, गिरजाबाय, ही जखम तुला तकी भयंकर वाटते? अगं आहे काय या जखमेत – हिच्यामुळं कदाचित फार तर मी मरेन --
गिरजा : विठूबाबा, असं बोलू नका. शपथ माझ्या गळ्याची.
विठू : एक विठ्या म्हार मेला, म्हणून अस्पृश्यता थोडीच मरणार आहे! एरवी तरी आम्ही जिते मेले सारखेच नव्हत का? बये, रामदर्शन आम्हा पाप्यांना नाही तर नाही, पण म्हाराचा हा निष्पाप हार दिखील रामरायाच्या चरणावर जाऊन पडायला नापाक ठरला अं?
गिरजा : हा हार रामरायाला का वाहायचा आहे? द्या, आत्ता मी देवळात जाऊन वाहून येते. [हार घेते.]
विठू : (तिला अडवीत) नको नको माझे बये, या हाराच्या पायीं हा महार जखमी झाला. नको बये तू या धाडसात पडू.
गिरजा : यात कसलं आलंय धाडस? आत्ता मी हा हार देवाला वाहून परत येते. कोण मला मज्जाव करतो, अन् माझ्या अंगावर हात टाकतो, ते मी पाहून घेईन.
[आत भडाग्नी प्रभृती - ‘‘ए केरोबा कळसुत्र्या, ए नारोबा मळसुत्र्या, अरे रांडलेकांनो देवळातले तुम्ही बडवे ना? बाहेर या बाहेर या.’’ उत्तर ‘‘आलो हो आलो’’]
विठू : गिरजाबाय, ऐकलीस या भुतांची आरोली. पाया पडतो. तू देवळात जाऊ नकोस, रंजल्या गांजल्यांच्या काकुळतीच्या किंकाळ्या वेळी देवळाच्या दगडी तटांना आरपार फोडतील, पण या भटांच्या पाषाण हृदयाचा पापुद्रासुद्धा हादरणार नाही बरं. बये, थांब, जाऊ नकोस पुढं.
गिरजा : [पायऱ्याकडे जाताना] मी जाणार. ही मी चालले. देवदर्शनासाठी तळमळमाऱ्या भक्ताच्या रक्तानं माखलेला हा हार –
[भडाग्नी, चव्हाटे, भंपकराव, केरोबा व नरोब प्र. क.]
सर्वजण : देवळाच्या पायऱ्या चढू देणार नाही.
गिरजा : आSस्सं! विठूबाबाला जखमी करणार चांडाळच का मला आडवीत आहेत?
पद. (राग – शंकरा, ताल – त्रिताल) (ऐसो धीट लंगर.)
ऐसि नीच करणि करि मुख काळे । पाशवि चाळे ।
कुटिल कपट मज ना माने ना माने ना माने ।।धृ.।।
रुधिर-कलंकित सुमन-मालिका । श्रीपदिं वाहिन ।
जनन सफल मम या मानें या मानें या मानें ।।१।।
चव्हाटे : गिरजाबाई, पायऱ्या चढू नका. तुमच्यासारख्या आक्रस्ताळी बाईच्या हातून देव देवळे बाटवण्यापूर्वी, आम्ही पैठणकर या पायऱ्यांवर आमचा जीव देऊन.
भडाग्नी : नाहीतर, हवा त्याचा जीव घेऊन. खाली उतरा.
भंपक : बाईमाणूस पडल्यात म्हमूनच तुमची आम्ही गय करतो. नाहीतर विठ्यासारखी कणीक तिंबवायला कमी करणार नाही.
गिरजा : तोफलखानाचा धुव्वा उडवणाऱ्या सरदाराच्या या पत्नीवर हात तर उगारून पहा ---
विठू : (त्वेषाने) त्या हातांची खांडोळी करून कोरड्या भाकरीशी खाईन.
(भट दबतात.)
गिरजा : या मर्दांची कणिक तुम्ही तिंबवणार? हा एकटा सगळ्या पैठणची मसणवटी करायला समर्थ आहे. पण बिचारा पडला जित्या आईचं दूध प्यालेला वारकरी. तो तुमच्यासारख्या नेलेल्या मुदर्यावर नाही कधी वार करायचा. ---ही मी अशी हा हार घेऊन देवळात जाणार. (पुढे सरते.)
(भट हाताची साखळी करून ‘हां खबरदार’ म्हणत आडवे होतात. )
भडाग्नी : गिरजाबी, तुम्ही महाराला शिवलात तर शिवलात अन् हा रक्ताभरला हार देवाला वाहण्यासाठी देवळात घुसता? काय हा अत्याचार!
चव्हाटे : ब्राह्मणाच्या बाईला तरी हा बाटगेपणा शोभत नाही. चला व्हा मागे---नाहीतर-
गिरजा : नाहीतर? नाहीतर काय?
भंपक : हात धरून खाली ढकलून देऊ. देवदेवळे भ्रष्टवण्यापूर्वी बाईमाणसाचा अपमान झाला तरी परवडला.
गावबा : गिरजाबाईंचा हात धरणारांची तोंडे तर मला पाहू द्या. थरकत घोडा भडकत निशाण करून टाकतो.
गिरजा : गावबा, तू हो बाजूला, मी आहे चांगली खबरदार या भ्याड मांगांना जाब द्यायला.
सर्व भट : काय! आम्ही मांग? आम्ही मांग?
गिरजा : हो, हो, या रामभक्त विठूबाबाला जखमी करणारे सारे मांग आणि हा खरा ब्राह्मण. या खऱ्या ब्राह्मणाच्या रक्तानं माखलेला हा हार देवाच्या गळ्यात जाऊन पडलाच पाहिजे. चला व्हा दूर. होता की नाही?
भंपक : अहो गिरजाबाई, अशा वर्दळीवर येऊ नका. अस्पृश्यांच्या स्थितीबद्दल आम्हाला काहीच वाटत नाही, असा का तुमचा समज आहे? फार फार वाईट वाटतं. डोळ्यांतून टिपे येतात; पण करायचं काय? ते आमचे धर्मबंधू त्यांचा आपला देव एकच. अखेर सगळ्यांना एकाच रामरायाच्या पायाशी --- एकाच मसणवटीत जायचं आहे ना?
गावबा : मसणातही लेकाच्यानो तुमचा सवता सुभा. ब्राह्मणांची मसणवटी निराळी, ब्राह्मणेतरांची निराळीं आणि अस्पृश्यांची त्याहून निराळी. एकाच ठिकाणी सगळे पेटलात तर काय नरकाला जाल? थरकत घोडा भडकत निशाण.
भंपक : अरे, पण सगळ्याच सवलती त्यांना एकदम कशा मिळतील?
चव्हाटे : आज हजारो वर्षे चालत आलेला धर्माचार एकदम कसा मोडता येईल? म्हणे म्हार मांगांना देवळात घुसवा.
गिरजा : घुसवा म्हणून कोण म्हणतो? पण भक्तिभावानं त्यांनी आणलेला हार सुद्धा देवळात जाऊ नये, हा कुठच्या गावचा धर्म?
चव्हाटे : हा पैठण गावचा धर्म, हे पैठण आहे पैठण, समजलात?
गिरजा : मी पण पैठणचीच आहे. अन् पैठणकरांचा भ्याडपणा मला चांगला ठाऊक आहे. इमादशाहीचा वाघ तोफलखान आमच्या सरदारांनी पर्नाळ्यात कोंडला नसता, तर पैठणचं आज एलीचपूर झालं असतं.
गावबा : आनं तुमच्या टाळक्यावरच्या शेंड्या हनवटीवर उगवल्या असत्या, समजलात?
भडाग्नी : पैठणचं एलीचपूर नि देवळांच्या मशिदी होईपर्यंत तरी आम्ही अस्पृश्यांना देवदेवळांचे हक्क देणार नाही.
गिरजा : मुसलमानी तुमच्या उघड्या डोळ्यांसमोर देवळे जाळलीं न् मूर्ति फोडल्या---
भंपक : तरी आम्हाला पत्करतील. पण अस्पृश्याचा नुसता हार देवावर पडलेला नाही आम्हाला खपायचा.
[सरदार एकनाथ प्र. क.]
एकनाथ : (गिरजेला) फिरा पाहू मागं. क्षेत्रस्थ महाजनांशी असं वर्दळीवर येऊ नये. त्यांच्या संरक्षणासाठीच ना आम्ही तळहातावर शिरं घेऊन मोहिमा झुंजवतो? देशातल्या लढाऊ तरुण पिढीच्या आहुति देऊन, परचक्रांच्या चढाया उधळून लावतो? ब्रह्मकर्मांच्या जोडीनेच क्षात्रकर्माची शिकस्त करतो? असल्या धर्ममार्तण्डांची अवहेलना करून का अस्पृश्यांच्या उद्धाराचा प्रश्न सुटणार आहे? चला, फिरा मागं. आधी विठूबाबाच्या जखमेचा बंदोबस्त करूया – कुठं आहे विठऊ. (विठूजवळ जातात.) विटोबा, विठ्ठला ---
विठू : कोण? सरदार एकनाथजी? मायबाप जोहार, सरदार, माझा रामराया—राम—रामजी (रडू लागतो.)
एकनाथ : [त्याला उठवून पोटाशी धरतो] विठोबा, विठूबाबा, आजच तुझ्या समाचाराला विठ्ठलवाड्यात मी येणार होतो. विठोबा, हिंदुधर्मावरील गंडातर टाळण्यासाठी परनाळ्याच्या मोहिमेत मेलो तो एकनाथ ब्राह्मण, नि तुझ्याजवळ आलाय, तो विठू वेसकराचा मर्द रामजी महार.
विठू : देवा माझ्या रामानं माझ्या महार समाजाचं तोंड उजळ केलं. माझ्या घराण्याचं नाव राखलं.
एकनाथ : रामजीनं क्षात्रकर्माची कमाल केली. मर्दुमीची शिकस्त केली. अखेरपर्यंत माझ्या उजव्या बाजूलाच तो सारखा लढत होता. तोफाच्या घडेबाजीनं किल्ल्याचा दरवाजा फोडून आम्ही आत घुसलो नि तोफलखानाला गिरफदार करण्याचा मुकाबला चालू असतानाच, गनिमाच्या एका फलटणीनी बंदुकांची फैर झाडली. त्यात आपला रामजी गारद झाला. देशधर्म देवासाठी त्यांन आपल्या जिण्याचं सोनं केलं.
गावबा : आणि त्याच रामजी मर्दाच्या बापाचं कपाळ फोडून या शहाण्यांनी आपल्या अकलेचं शेण केलं. थरकत घोडा भडकत निशाण.
एकनाथ : गावबा, हा त्या बिचाऱ्यांचा दोष नाही. परंपरेच्या पायदळींन पतित झालेल्या त्यांच्या विद्येचा नि संकुचित चकारीनं चालणाऱ्या धर्मकल्पनांचा तो दोष आहे. काळाच्या ओघाबरोबर धर्माच्या नि कर्माच्या कल्पना बदलत असतात, ही जाणीवच त्या बिचाऱ्यांना नाही. शूद्रातिशूद्र ठरवलेल्या नि आजन्ममरण कपाळावर अस्पृश्यत्वाची डागणी डागलेल्या रामजीनं, मोठमोठ्या जन्मसिद्ध क्षत्रियांना क्षात्रधर्मात दिङ्मूढ करावं ---
विठू : आणि या अभागी विठ्यानं देशधर्म देवासाठी पांढरेपेशांच्या लाथा लाठ्या खाण्यासाठी जिवंत राहावं----आS आS पाणी पाणी पाSSणी-मला थोडं पाणी पाजा –
(खाली पडतो. सर्व ‘पाणी आणा-पाणी आणा’ ओरडतात.)
एकनाथ : गावबा, गावबा, कुठून तरी झटकन पाणी घेऊन ये पाहू.
गावबा : अहो भटजी, भंपकराव, भडाग्नी, चव्हाटे, थोडं तुमच्या पंचपात्रीतलं पाणी द्याहो.
भडाग्नी : पाणी? महाराला पाजायला? नाही मिळणार.
गिरजा : तान्हेल्या माणसाला पाणीसुद्धा देत नाही? मेल्यांनो, तुम्हाला देवानं निर्माण केलं का सैतानानं?
भंपक : तुमचा आमचा बाप एकच.
एकनाथ : धर्ममार्तंडांनो, तुमच्या काळजाची ही कठोरता पाहून फत्तरसुद्धा शरमेनं उफलतील. अहो, लढाईच्या धुमाळीत शत्रूचा शिपाई पाणी पाणी करीत असला, तर त्यालासुद्धा पाणी पाजून आम्ही जीवदान देतो. इथं तर हा शुद्ध भूतदयेचा प्रश्न आहे. शिव शिव!
गावबा : अहो, ही भटं जगतीज्योत भुतं. यांना कसली दया न् माया! थरकत घोडा भडकत निशाण.
एकनाथ : क्षेत्रस्थ बंधूंनो, भूतदयेला पाठ दाखवून शुद्ध मानव धर्माला कलियुगाचं काळं फाशीत आहात तुम्ही.
सर्व भटजी : तुम्ही आहात ना कलियुगाचे कलीपुरुष! आपण हांसे लोकाला न काजळ माझ्या नाकाला.
एकनाथ : मर्जी आपली – चला, गावबा विठूबाबाला आपल्या घरी घेऊन चला--
सर्व भटजी : काय? ब्राह्मणवाड्यात महार नेणार?
चव्हाटे : एकनाथ, हा भ्रष्टाकार नाही आम्हाला खपायचा.
भडाग्नी : महारड्यांना मिठ्या मारायच्या असतील तर महारवाड्यात बिऱ्हाड थाटा.
एकनाथ : वेदोनारायणांची इच्छा पूर्ण होईल.
गिरजा : अनाथ अपंगांच्या उद्धारासाठी महारवाड्यालाच आम्ही विठ्ठलवाडा बनवू बरं! निवृत्तीज्ञानदेवांनी पावन केलेला तो विठ्ठलवाडा पाहून, देवसुद्धा आमचा हेवा करतील.
एकनाथ : आता बोलण्यात वेळ घालवू नका. चला चला आपल्या घरी घेऊन न् वैद्यराजांना बोलावून आधी त्याच्या जखमेवर इलाज करा. चला उचला. झटपट करा.
गिरजा : नाही, थांबा. या रामभक्ताचा हा रक्ताभरला हार देवळात जाऊन मी रामाला वाहीन, नि मग विठूबाबा इथनं हालतील. नाहीतर मी या पायऱ्यांवर माझा जीव देईन. न् विठूबाबा इथं पाणी पाणी करीत प्राण सोडतील.
एकनाथ : मला तुमच्या हृदयाची तिडीक समजते, पण असल्या आग्रही आतताईपणानं अस्पृश्यांच्या उद्धाराचा प्रश्न कसा सुटणार? महाराचा हार देवाच्या गळ्यात पडला, म्हणजे अस्पृश्यता गेली, अशी का आपली समजूत आहे?
गिरजा : प्रश्न समजुतीचा नाही, तत्त्वाचा आहे. तत्त्वासाठी प्राण द्यायला हरकत कसली?
एकनाथ : प्राण देण्याची आततायी कल्पना तत्त्वाला पोषक झाली, तरी तेवढ्यानं मूळ मुद्दा गुन्ता सुटत नाही तो नाहीच! जीव देणारे जीव देतील, काही थोडेसे हळहळतील, यापेक्षा या आग्रही आततायीपणाला फारसे यश येणार नाही. भावनेच्या खळखळाटानं किंवा उपासतापासाच्या न् जीव देण्याच्या धमक्यांनी अस्पृश्यतेचा प्रश्न सुटणारा नव्हे. भावना कितीही खवळली उसळली, तरी व्यवहार व्यवहाराच्या कदरीनंच केला पाहिजे.
पद (राग – खंबायती, ताल - त्रिताल)
लवभाव ना। असे भावना ती ।।धृ.।।
व्यवहार सारा विकारेंच नासे ।।
विवेकाविना ना कुणा सद्गती ।।१।।
आधी विठोबाच्या जखमेवर इलाज करू, आणि मग योग्य त्या विवेकी मार्गानं, याच ब्रह्मदेवांच्या
---
गावबा : ब्रह्मसंबंधांच्या---
एकनाथ : कृपेनं गंगाजलानं दख्खनची अस्पृश्यता योग्य वेळी धुवून टाकू. हजारो वर्षांच्या रूढीच्या रोगानं ताठर बनलेली मनोवृत्ती एकाच दिवसात कशी बदलेल?
विठू : (उठून) गिरजाबाय, आण तो हार इकडं. मी स्वतः देवाच्या गळ्यात घालणार.
गिरजा : हा घ्या, चला तुम्ही न् मी दोघेही देवळात जाऊ.
चव्हाटे : एकनाथ, विचार करा. दोघांनाही आवरून धरा.
भडाग्नी : रामनवमीच्या दिवशी तरी रामाच्या पायऱ्यावर खुनाचा प्रसंग आणू नका.
भंपक : रक्तपात होईल रक्तपात!
एकनाथ : रक्तपात पाहिला नसेल, त्याला रक्तपाताची भीती. या एकनाथानं अर्घ्यदाना इतकीच रुधिरदानाचीही रंगपंचमी खेळलेली आहे. पण हे समरांगण नाही, धर्मांगण आहे, याचा आमचा विवेक जागा आहे.
विठू : मायबाप भिऊ नका. ओरडू नका, गिरजाबाय, फत्तराच्या काळजाच्या माणसांनी फत्तराच्या तुरुंगा कैद केलेल्या, फत्तराच्या देवापेक्षा – या विठू महाराचा हार-हा पहा-खऱ्याखुऱ्या-चालत्या बोलत्या माझ्या दिल्दार रामरायाच्या गळ्यात पडत आहे. (एकनाथाच्या गळ्यात हार घालतो व पाय धरीत असता झीट येऊन पडतो.)
गिरजा : उचला, उचला, विठूबाबा झीट येऊन पडले-उचला.
[पाणी पाणी असा ओरडा]
पहिला अंक समाप्त
अंक दुसरा
अंक २ रा
प्रवेश १ ला
[हातात फुलांची परडी घेऊन, झपझप पावले टाकीत सीता येते. आतून केरोबा ‘शूः शूः सीते-सीते-सीताSS’. अशा हाका मारतो. ती एकदा मागे पाहिल्यासारखे करते आणि तडक निघून जाते.]
केरोबा : (प्र. क्र.) निसटलीच ही बिजली. आहा! जिवाच्या विसाव्याला असली मोहिनी मिळेल तो पुरुष धन्य. देवळातली देवपूजा टाकून, गेले सहा महिने या देवीच्या पाठलागावर मी सावलीसारखा फिरत आहे. मी ब्राह्मण- ही महारीण. मला या सीतेचं एवढे आकर्षण का? तिला माझं आकर्षण असेल-किंवा नसेलही कदाचित. नसलं, तर तिचा तो दोष नाही. प्रेमी जिवांच्या साहजिक आकर्षणाला बेमुर्त अटकाव, हाच जिथं आमच्या धर्माचा न् जातीभेदाचा रानटी दंडक, तिथं त्याबिचारीनं आपल्या दिलाच्या दिल्दारीचे दरवाजे घट्ट लावून बसण्यातच जीवनसाफल्य का मानू नये? (दूर पाहून) या महारवाड्यात हा पठाण कोण?
(पठाण वेशांत गावबा प्र. क.)
गावबा : ओहो, ओहो, केरोबा बडवे आलेकम् सलाम. मिरचीकम् सलाम् लसूनकम् सलामं. का? अलिकडे महारवाड्यात फारशा वाऱ्या स्वाऱ्या चालल्यात आपल्या? काही अस्पृश्योद्धाराचा डाव आहे वाटतं?
केरोबा : (गोंधळून) हो जवळ जवळ तसंच. पण गावबा? तू पठाण कधीपासून झालास?
गावबा : गेल्या रामनवमीच्या पारण्याला मी ही दीक्षा घेतली. त्या दिवशी भटभोजनाऐवजी एकनाथानी महार मांग धेडाना जेवण घातलं नी त्यांच्या पंक्तिला ते जेवले. त्यांना तुम्ही वाळीत टाकलं. घरादारावर तुळशीपत्र ठेवून ते महारवाड्याशेजारी गेले. त्यांना तुम्ही केलं महार. म्हणून मी बनलो पठाण. केरोबा होता का तुम्ही पण महार? मी करतो तुम्हाला महार, महार व्हा बुवा. म्हणजे असल्या बुरखेबाज हेलपाट्यांच्या पायपिटीशिवाय, उघड्या माथ्यानं तुम्हाला अस्पृश्योद्धार चांगला करता येईल.
केरोबा : एकनाथाबरोबर तू का नाही महार झालास? पठाण कशाला झालास?
गावबा : अहो, थरकत घोडा भडकत निशाण, महार भटांना भितो. फार भितो. पण भटांनी पठाण पाहिला का गंगेचा घाट धोब्यांनी फुललाच.
केरोबा : गंगेचा घाट धोब्यांनी फुलला म्हणजे अस्पृश्यद्धार झाला वाटतं?
गावबा : नाहीतर काय, म्हारवाड्यावर बडग्यांचा वाऱ्या स्वाऱ्या होऊ लागल्या, म्हणजे अस्पृश्योद्धार होणार वाटतं? हे पहा, सगळे महार मांग धेड चांभार, मुसलमान तरी झाले पाहिजेत, नाहीतर पेशावरी पठाण्यांच्या टोळ्या पैठणी भटांच्या छातीवर चढल्या पाहिजेत. त्याशिवाय अस्पृश्यांच्या उद्धाराचा तिसरा मार्ग नाही, केरोबा, थरकत घोडा भडकत निशाण पाहिजे. बोला तर मग, महार होता का पठाण होता? पण लक्षात ठेवा, महाराला गुंता न् पठाणाला सुंता, टळायची नाही. का आपले भटोबात राहता?
केरोबा : विचार केला पाहिजे. बरं येतो मी. (जाऊ लागतो)
गावबा : येऊ नका. जा-पण थांबा. तुम्ही अस्पृश्योद्धार करणार, -- नाही का? पात्रापात्र विचार ठरलाच असेल, तो ती का ते?
केरोबा : पाजी! (रागाने जातो.)
गावबा : (स्व.) कमाल आहे बुवा या पैठणी गावगुंडीची. एकनाथासारखा एवढा मोठा पराक्रमी सरदार, दिलाचा दिल्दार, पट्टीचा पंडित. पण त्यांनी अनाथ अपंग अस्पृश्यांच्या उद्धाराचा प्रश्न हाती घेताच, साऱ्या पांढरपेशांचे डोळे पांढरे झाले, न् हजार हिकमती करून त्याला घरादाराला मुकवलं. आता, कर्जाच्या उधराणीसाठी त्या दुलिचंद तीनशेण्ड्याला धरणं धरायला त्यांच्यावर सोडला काय? [पद पुरवणीत पहा.] पण त्या पाजी बडव्याच्या पाळतीवर आता चांगलंच राहिलं पाहिजे! (जातो.)
[दाढी मिशी वाढलेला, कपडे मळके, असा म्हादबा प्र. क.]
म्हादबा : (आश्चर्याने सगळीकडे टेहळणी करतो.) आं आरिचिभन! सा म्हयन्यात समदी दुनया फिरली. का माजं डोळंच फिरल्याती! ह्ये पयठाण का त्ये पयठाण? त्ये-त्ये तर पैठाणच अक्षि. मंग ह्ये नईन पैठण इथं कवा आलाया? ह्ये तर महारवाड्याचं गावठाण. आन् म्हारवाडा काय झालाया? ही समदी मण्डोली तर वळखीची म्हारंच. आयाबायाबी-व्हय, म्हारनीच न्हवत जनू! काय, झालाया काय चिमित्कार ह्यो. समदं महार बाप्ये न् आया-वा! अक्षी पांढरपेश्यावर तान झाल्याती. लइ इस्वाच. लइ इस्वाच. म्हारानी म्हराठ्यावर तान केलिया जनु. ह्यो म्हारवाडा? कोन म्हंगल येला म्हारवाडा जी! सराळ वळीमन्दी कशा अक्षि नामी नामी टुमदार झोपड्या. त्यो लहानगा फुलाचा बाग. पल्याड भाजीपाल्याचं हिरवगार मळं. हिरीवर म्वाटबी चाललीया. केराचं काटुकबी न्हाय कुठं गवसायचं. अक्षी नामी. अक्षी चोखाट. वाड्याच्या मदुमद द्येवाच देवाळबी हाय, पुण्डलीक वरदे हाSSरी इण्टाल. (साष्टांग नमस्कार घालतो.)
गावबा : (प्र. क्र.) (म्हादबाला पाहून) हा कोण लोळपाटण्या इथं? (म्हादबा उठतो.) कोण? ओहो! म्हादबा पाटील? रामराम – रहिमराम. आलात का दौलतबादच्या तुरुंगाची सहा महिने हवा खाऊन?
म्हादबा : कोन? गावबा? – आचीर आचीर, समदंच आचीर, आन् ल्योका गावबा, मुसलमान कवा झालाय तू? बामनं काय बोलत्याल?
गावबा : बोलत्याल आपलं बोडकं. अकलेच्या म्हसोबा, भटांच्या हुलकावणीनं खडी फोडून आलास तरी तुझं ‘‘बामनं काय बोलत्याल’’ कायमच आं?
म्हादबा : गावबा लइ वंगाळ काम केलाया मी, ग्यानबाच्या माळेच्यान् लइ वंगाळ! यकनाथ महाराजांच्या पायावर डोकशी ठेवल्याबगार आनपान्याला न्हाय यो म्हादबा शिवनार. कुठं हाईत एकनाथजी महाराज?
गावबा : ते महाराज महारांचे राजे होऊन, राजवाड्याऐवजी म्हारवाड्यात जाऊन बसले आहेत. त्यांना शिवलास, का तू पण होशील महार. मग बामनं काय म्हंगत्याल?
म्हादबा : एकनाथ महाराज म्हार?
गावबा : पैठणकर भटांनी त्याना केलं महार, म्हणून मी झालो पठाण.
(आत मारवाड्याची बडबड चालते.)
म्हादबा : म्हजी? ह्यो काय चिमित्कार? सा म्हयन्यात पैठणचा भूतखाना?
गावबा : भूतखाना का शेतखाना ते आत्ताच पाहून घे. जरा बाजूला ये. (त्याला घेऊन जातो.)
(दुलिचंद मारवाडी तणतणत येतो. पाठोपाठ एकनाथ त्याची समजूत घालीत प्र. क.)
मारवाडी : साला मोथा सादू बोत्ते. सगदागचा दिमॉक मिगवते. हामचा पैसा कसाला नाय देऊन ताकते? पॉच बगस जाला. ऑत्ता देते, ऊदा देते, पगवा देते. साला थॉपबॉजी कत्ते? साँगला साँगला बॉमनसी तकलॉग कत्ते. म्हॉग म्हॉग सी जेवाला घॉत्ते. बॉत्या, बॉत्या. समदा हिंदू धगमला ऑग लावली. पेठनसी पलाला नि ये म्हॉगवाड्यामन्दी येऊनशी लपला. साला ए मगवागीला बनावते? तूजा बॉप पेसा टॉक. दुसरी बॉत नही. पैसा टॉक.
एकनाथ : (स्व.) पैठणाच्या धर्मबांधवांकडून माझे सर्व संस्कार यथास्थित झाले. चव्हाठ्यावरच्या जोडेपैजारीचा हा संस्कारच काय तो राहिला होता. चित्तशुद्धीसाठी याची जरूर असतेच. (उ.) शेटजी, आज पांच पिढ्यांचा तुमचा न् आमचा व्यवहार. असे वर्दळीवर येणं शोभतं का तुम्हाला?
मारवाडी : ही बम्बग्यान् ते तुज्या जिनॉग्दनेजीला साँग. ये दुलीशनला नको साँग. हॉमसा पिसा टॉक. पन्दगा हजॉग! काय समदा तठ्ठा कत्ते? पीसा टॉक.
एकनाथ : अहो, पंधरा हजार असोत. नाहीतर पंचवीस हजार असोत. दौलताबादेहून पर्नाळ्याच्या मोहिमेच्या खर्चाची थैली सात आठ दिसांत आली म्हणजे तुमची रकम घरपोच पाठवतो.
मारवाडी : अगे सुSSलीत गेला ते दोल्ताबाद न् ते तुजा पन्नाला. कसला साँगते ते थेलीची वॉग्ता. दोन बगस झाला. लेस्मीपूंजनलाबी बेज नाच, मूंदल नाय. वॉयदा-वॉयदा! जवा बगावा तवा वॉयदा. साला वॉयदा काय कॉयदा हे! कॉयदामा कइ फॉयदा हे! बस. पीसा टॉक. भॉनसोद कग्जा कात्ते नि धगम कत्ते. पीसा नाय तो धगम कसाला मगाला कत्ते? पीसा टॉक. समदा पीसा बॉमनशी पोटात घातला. आता साला म्हागमाँगशी बोडक्यावग धागते, नि दुलीशनला वॉयदा साँगते. पीसा टॉक. भॉनशोदनी धगम् डुबवला. मगवागीला डुबावते? ए दुलीशनला बुगवते? धगम् गया जान्हम्मा. माजा पीसा टॉक. साला धेडं लोकची वास्ते मगते, मंग आमचा पीसा कसाला नही देते? सोग. भॉनशोद लुस्या. थॉपबाजी कत्ते?
एकनाथ : असली शिवीगाळीची अभद्र भाषा आपल्यासारख्या नगरशेटजीला शोभत नाही दुलिचंदजी.
मारवाडी : अगे, मगवागीला समदा शोभते, समदा शोभते. पीसा टॉक हामचा बस. पीसा टॉक.
एकनाथ : शेटजी या वेळी माझा नाइलाज आहे.
मारवाडी : ए गोष्टी ए दुलिशनला नको सांग, पीसा टॉक.
एकनाथ : पैसा असता तर दिला का नसता शेटजी.
मारवाडी : अगे पीसा नॉय तो बजागमंदी बायके बेचून टक्का हान. (‘‘बायको बेचून टक्का हान?’’ अशी गर्जना करीत संतप्त गावबा येऊन मारवाड्याची मान पकडतो.)
मारवाडी : पिथान-पिथान मगिगियो, ए बालाजी, ए बंकटसगजी, ए गणछोड-गायजी, मगिगियो, मागिगियो. पिथान मारी जान मारी नाखशे. ए हिकनाथजी म्हाको बचाव.
एकनाथ : गावबा, गावबा, सोड त्याला.
गावबा : सोड सोड काय करता? गिरजाबाईची बदनामी? जीभ खेचून टाकीन. तीन टकलीच्या तुम्हाला कुणी आया बहिणी बायका असतात की नाही? [मारवाडी ‘‘ पाँव पडू, पाँव पडू. हिकनाथजी म्हाको बचाव’’ असे किंचाळतो.]
एकनाथ : गावबा, अरे मरेल तो, सोड त्याला. दोष आपला. आपण त्याचं देणं लागतो ना? सोड त्याला. आपण भागवत, विष्णुदास. आपल्याला नाही हे शोभत.
गावबा : शोभत नाही काय? सारं शोभतं, ‘‘मेणाहुनि मऊ आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे।। भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा।।’’
(मारवाड्याच्या डोक्यावर काठी मारून त्याला सोडतो.)
मारवाडी : बचि यो, ओसे बालाजी, ओ बंकटजी, बचि गिओ. (गिरजा दागिन्याचा डबा घेऊन येते.)
गिरजा : शेटजी, तुमच्या स्वभावधर्माप्रमाणं आमच्या पुरुषांचा अपमान करून, भरलं ना तुमचं पोट?
गावबा : रिकामं असलं तर मी शेण भरतो.
गिरजा : तुम्हाला काय दोष द्यायचा म्हणा. माणसासारखी माणसं पैशासाठी पशू किंवा पिशाच्च कशी बनतात, हे जगाला दाखवण्यासाठीच, मला वाटतं, देवानं हा प्राणी पैदा केला असावा. हं, हे घ्या माझे दागिने. (डबा देते.) विकून टक्के करा नि येईल ती रक्कम आमच्या खाती जमा करा.
एकनाथ : गिरजा-गिरजा, हे तुझं स्त्रीधन!
गिरजा : स्त्रीवर जर पतीची सत्ता, तर तिचं धन कुणाची मालमत्ता? जनता-जनार्दनासाठी इकडं फकिरी घेतल्यावर मला ही दागिन्यांची अमिरी पाहिजे कशाला?
मारवाडी : (दागिने तपासून) गिरजाबॉय लइ साँगला, लइ साँगला माणूस!
गावबा : दिडकी दमडीच्या, या मावलीला तू बाजारात विकायला काढतोस होय?
मारवाडी : गावबा, पाँव पडू, गिरजाबॉय पाँव पडू.
(सीता दागिन्यांची पुरचुंडी घेऊन प्र. क.)
सीता : जोहार माबाप जोहार. गरीबाची ही फुलाची पाकळी नाकारू नका.
(एकनाथाच्या पायाजवळ पुरचुंडी ठेवते.)
एकनाथ : मुली, काय आणलंस हे?-- काय? दागिने? कशाला?
सीता : देवाच्या देवपूजेला मायबाप. मला विधवेला यांचा आता काय उपयोग? ज्यांनी ते केले, ते देवाघरी गेले –
पद. (चाल-प्रणयतरंगासवें.)
चारूशीला दागिना । हाच आवडे मना ।
कांचनीं वांछना घडवि शील-लांछना ।
सतत मनि विवंचना ।।धृ.।।
घन-घर्षणि चंचला ।
तेज उजळि भूतला ।
सति चमकत पतिविना ।
करूनि शीलवर्धना ।।कांचनी.।। १।।
करायचे काय ते दागिने मला आता? द्या ते या मांगाला नि करा त्याचं तोंड बंद. साऱ्या पैठणची माणुसकी मेली तरी या म्हारवाड्यातून नाही बरं ती गेली. (पुरचुंडी मारवाड्याच्या अंगावर फेकते.) कर मेल्या तोंड काळं. गिरजाबाईंना बाजारात विकायला काढतोस होय?
विठु : (प्र. क.) अरे, आमच्या मायबापाकडं वाकडी नजर टाकायची कुणाची छाती आहे? चल घे हे माझ्या शेतवाडीचे कागद. न् फाड सरदारांच्या नावानं दोन हजारांची पावती.
मारवाडी : (कागद घेऊन पाहतो.) साँगला, लई साँगला लोक तुमी. गिरजाबाई साँगिला, शीटाबाई साँगला, अने विठाबाई बी साँगला.
एकनाथ : विठुबाबा, सीता, काय मांडलं आहात हे तुम्ही?
विठु : गंगेच्या पाण्यानी गंगेचीच पूजा केली, मायबाप.
गिरजा : विठूबाबा, आम्ही आमच्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं, पण तुम्ही सगळ्यांनी असं करून कसं भागेल?
सीता : मायबाप, अनाथ अपंगांच्या उद्धारासाठी, आपण संसाराची होळी केली. मग आमच्या वेसकर घराण्यातली चारदोन मानाची लाकडं, नको त्या होळीत पडायला?
एकनाथ : आहा! नीच अस्पृश्य ठरवलेल्या हीनदीनांचा शुद्ध माणुसकीचा हा जिवंत जिव्हाळा पाहून, माझं सारं अध्यात्मज्ञान आज फोल ठरलं.
गिरजा : याला म्हणतात हृदयाची श्रीमंती बरं! (सीतेचे तोंड कुरवाळून) मुली, कोणत्या ग देवानं हा वाणी करणीचा गोडवा तुला दिला?
सीता : फुलांचा सुगंध मातीला लागला मायबाप.
गिरजा : रामजी शिलेदाराची अर्धांगी शोभतेस खरी. पण जगाची नजर मात्र काही चमत्कारिकच!—
पद. (चाल. मर जाऊंगी बिना देखे.)
अवमानिती गुणा डोळे विषारी हे ।।
सारि दुनिया फिरे का नजर फिरे ।।गुणा.।।
भाव नवा हा धर्म सुमनांचा ।
कधिं प्रेमां सु-मन तें लव ना फिरे ।।गुणा.।।
सौंदर्य बाह्य तरुणीचे भुलवि नजर ती ।
चारूशील वसे अंतरीं जणु तिखट कदर ती ।
दगड देव उरी जीव जिता धरिती दुरी ।
‘‘शिवशिल दूरदूर’’ कटुभाषी हृदयीं सुरी ।।गुणा.।।
विठु : (मार.ला) चल दे पावती लिहून.
गावबा : का दाखऊ थरकत घोडा भडकत निशाण.
मारवाडी : ए गावबा, पाँव पडू, पाँव पडू. ए हिकनाथजी, तू लई साँगला बॉमनं. पाँव पडू. कैं. बोल्याचाल्या ते मणमा नही राखशो जी हाँ. ए बेवाग छे. बेवागमा खट्टी मिट्टी बात शाम्बळवीज जोईए- में जाऊ?
गावबा : आणि पावती कोण तुझा बाप देणार?
मारवाडी : अगे इसा पाँती पाँती काय कत्ते? काले सवागे दुकानमाथी मेजून देते – कई इश्वास बिश्वास??
विठु : तुमच्यावर विश्वास? मग सापावर तरी का नसावा?
गावबा : चल हो पुढं. का करू थोतरीची बोतरी.
मारवाडी : अगे म्हागो लाढीजी, थागा व्हाला बचीगियो रे म्हागा बालाजी! [जाऊ लागतो. तोच आत ‘‘किधर रेहता है सरदार इकनाथ’’ असा जोरकस शब्द ऐकू येतो. मारवाडी घाबरतो. ‘‘अगे पिथान् विथान्, मगी गियोरे बाबा, पिथान!’’ असे ओरडत जातो. गावबा त्याच्या मागोमाग जातो.]
(निशाणाचा भाला घेतलेला आरब स्वार प्र. क.)
स्वार : किधर है इकनाथ सरदार? [विठु बोटाने दाखवतो] यह आदमी इकनाथ सरदार? पागल, क्या खूब मजाक मचाते हो? आज बडी फाजरसे पैठणका तमाम मोहल्ला मोहल्ला घूमघूमके ढूँढ रहा हूं कोईभी शक्स सरदारका पता नही बतलाता. क्या यह पैठाण है, या पागलखाना?
एक : ऐ नादान बकवा बिलफेल बंद कर. जिस शक्सको सरदार इकनाथ केहलाते हे, इसीके सामनेही तू खडा है. बोल, क्या तेरा बयान? कहां से आया?
स्वार : बडी ताजूबकी बात? इकनाथजीको इक दो दफा मैने दौलताबादमें देखा था. वाहवा, कैसा बडा उमदा अमीर! उसीका नूर देखतेही दिल आराम होता था! आप मुझे कंगाल फकीर दिसते हो.
एक : फकिरी पाया तो क्या हुवा?
पद. (इस तन धनकी)
अल्ला रखेगा वैसाही रहेना ।
मौला रखेगा वैसाही रहेना ।।धृ.।।
कुइ दिन राजा बडा अधिकारी ।
एक दिन हुआ कंगाल भिकारी ।।१।।
एका जनार्दनि करत कर तारी ।
गाफिल, क्यंव करता मगरूरी ।।२।।
स्वार : बडा अवलिया जनार्दन दिवानजीका नाम? कुसुर माफ, सरदार, कुसुर माफ! मय आपके दिलकू रंज खीचा हूं, मुझे माफ हो.
एक : माफ भाई माफ. क्या तू दौलताबादसे आया?
स्वार : शेहेनशा मूर्तुजा निजामशहाके खास मोर्तबकी यह थैली, दिवाण अवलिया जनार्दनजीने, आप हुजूर के खिदमतमे सुपूर्द करनेके वास्ते एक बंदेको हुक्क फर्माया है, शैलीमे तीस हज्जारके रोखे रख्खे है. गिनके लेना. और बंदेकू फौरन वापस जानेकी ताबिल देना.
(सलाम करून जातो.)
एक : (थैली मस्तकाला लावतो) काय चमत्कार आहे या लक्ष्मीचा. हिच्यासाठी जे जीव टाकतात, त्यांच्याकडं ही ढुंकूनसुद्धा बघत नाही. अन् जे हिचा संन्यास करतात त्यांच्या पायाशी ही अशी लोळण घेत येते. जडमूढ जीवांच्या पाषाण हृदयातनं माणुसकीचा पाट फोडण्यासाठी आम्ही दारिद्र्याचं कवच पांघरलं. मनोवृक्षावर मोहाचं मोहोळ माजू नये, म्हणून या विठ्ठलवाड्यात वस्ती केली. तरीदिखील या लक्ष्मीची मोहिनी काही आमची पाठ सोडीत नाही.
गिरजा : या मोहिनीला आपला नाद चांगलाच लागलेला दिसतो. आमच्या दरिद्री संसाराचं वैभव या सवतीला पाहवत नाहीसं दिसतं!
अभंग
या गरीबिच्या संसाराचे कोण मोल देई ।।
कोण मोल देई । बाई कोण तोल देई ।।धृ.।।
कोण्डियाचा गोड माण्डा । समाधान हातीं खाण्डा ।
स्नेहभाव या ब्रम्हाण्डा । व्यापुनिया राही ।।१।।
आप्त बन्धु सगळी दुनिया । भेदभाव गेला विलया ।
नजर जाइ तिकडे माया । पान्हवती गाय ।।२।।
श्रीमन्तिचा हेवादावा । प्रेमामधें उजवा डावा ।
नीच थोर असला कावा । ठाऊकाच नाही ।।३।।
जनार्दन जनता सारी । एकनाथ हरि कंसारी
पूजि सतत या संसारी । रमाकांत पाय ।।४।।
एक : विठोबा, आजच्या आज ही थैली सुभेदाराकडं पाठवून द्या नि त्यांना म्हणावं गेल्या लढाईत जखमी झालेल्यांना नि ठार झालेल्यांच्या वारसांना ही रक्कम वाटून द्या. सरकारचा पैसा सरकारी कामालाच खर्ची पडला पाहिजे.
सीता : आमच्य़ाकडं मात्र त्य़ातली दिडकी य़ेता काम नाही बरं ! आम्ही घेणार नाही.
विठू : त्य़ाची वासलाद मी लावतो. ही थैली घेऊन तू चल पाहू घरी देवदर्शन घेऊन आलोच मी पाठोपाठ.
[गिरजा, सीता, विठू जातात.]
एक : (स्व.) झाला हा प्रकार ठीकच झाला. आत्मोद्धार किंवा समाजोद्धार साधायला सर्वस्व त्यागासारखं दुसरं अभेद्य कवच नाही. आता मात्र मी खराखुरा सरदार बनलो. आत्मबल नि वैराग्य या ढाल समशेरीनंच हिंदूंच्या कठोर मनोवृत्ती व हल्ले चढवून, मला या अनाथ अस्पृश्यांच्या उद्धाराचा मार्ग चोखाळला पाहिजे. जन्माच्या सबबीवर मूठभर मगजबाज लोकांनी, इतर हजारो जातींना क्षुद्र लेखावं, त्यांना तिटकाऱ्यानं वागण्यातच आपल्या श्रेष्ठपणाचं मंडन करावं, अडीत तीन कोट लोकांना अस्पृश्य मानून त्यांना मसणवटीच्या राहणीत डांबावं, अन् हे सगळे अत्याचार न् जुलूम, धर्माच्या नावावर बिन्टकाव चालू रहावे, या धडधडीत अन्ययाविरुद्ध माझ्या रक्ताचा थेंब न् थेंब बंडासाठी सणाणत आहे.
(जाऊ लागतो तोच म्हादबा दबकत भीत प्र. क.)
एकनाथ : कोण? म्हादबा पाटील?
म्हादबा : (पायावर डोकं ठेवीत.) म्याच नव्हका त्यो पापी? द्येवा, म्या लई वंगाळ काम केलाया. लई पापी.
एकनाथ : पापी? म्हादबा, पापी कोण नाही? आपण सगळे पापी. आम्ही पापी. ही दख्खन पापी. आमचा चालू धर्म पापी. फार काय पण म्हादबा. पांढरपेश्यांच्या आचार-विचारात माणूसघाणेपणाची कीड घालणारा देवसुद्धा मी पापीच समजतो.
म्हादबा : असत्याल. पुन म्हाराज. इण्टू एसकरला भटांच्या चितावणीनं हकनाक जखमी करनारा ह्यो म्हाद्या समद्याहून लइ वंगाळ. लइ पापी.
एकनाथ : दोष तुमचा नाही नं कोणाचाही नाही. दोष काळाचाआहे. कुठं तरी काहीतरी चुकलंय. माणसाशी माणासासारखं वागण्याइतकीही माणुसकी ज्या धर्मात नाही, तो आचन्द्रार्क आम्हाला गुलामगिरीतच पिचवणार खास, हिंदू समाजाचे धुरीण म्हणवणारेच जिथं माणुसकीला पारखे झाले, तिथं तुम्हांला काय दोष द्यायचा?
म्हादबा : न्हाय म्हाराज, समदा दोष माजाच. आन् त्येच पराचित पुन् म्या भोगलाया. अक्षी निरोती ग्येनबाच्या या माळेच्यान् --
एकनाथ : (चपापून) काय? तुमच्या गळ्यात माळ? तुम्ही माळकरी?
म्हादबा : व्हइन्हाय, माळ घातलीया. चाळ भान्दुन टाळ घेऊन भजान करतुया. ग्यानबा द्येवाचं. णामदेवाचं अभाग गात पण्डरीला दिण्डी घ्येऊनशान दरसाल जातोया, अन्---
एकनाथ : अरे अरे! विठू पण माळकरीच. त्याला जखमी करायचा अविचार तुमच्या हातून कसा झाला म्हादबा?
म्हादबा : बामनानी अक्षी चिथावलंच न्हव जनू!
एकनाथ : पण तुम्ही त्यांच्या चिथावणीला कसे बळी पडला म्हादबा! भिक्षुकी धर्मानं समाजाची घडी बिघडली, धर्माच्या खऱ्या अर्थाचा अनर्थ केला. अन् सगळीकडे माणूसघाणीचा उकिरडा फैलावला. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ-दीपिका पाजळून, भागवत धर्माचा पाया याच विठ्ठलवाड्यात घातला ना?
आपण माणसं सारी एका देवाची लेकरं, त्यात कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. कुणीकुणीचा विटाळ मानू नये. सगळ्याशी बंधूप्रेमानं वागावं. मोक्षाचा अधिकार सगळ्यांना सारखा. ही आपल्या भागवत धर्माची शिकवण, ही तुळशीची माळ, रात्रंदिवस तुमच्या मनावर बिंबवीत असता, विटोबा वेसकर – जातीनं महार – म्हणून तुम्ही त्याच्यावर हात टाकावा?मागासलेल्या स्पृश्यास्पृश्य ब्राह्मणेतर समाजांच्या उद्धारासाठीच भागवत धर्माची ध्वजा फडकली ना म्हादबा? अन् तुम्ही मराठे बंधूच जर असा आचरटपणा करू लागला, तर आळंदीला समाधिसुखात डुलणाऱ्या ज्ञानोबारायांना काय वाटेल बरं? त्यांच्या काळजाला चटका बसेल. त्यांचा समाधि-भंग होईल. निवृत्ती देवांची वृत्ती कावरीबावरी होईल. मोक्षसोपान चढलेले सोपानदेव जागच्या जागी थबकतील. मुक्ताबाई ढळढळा रडू लागतील. नामदेवरायांच्या अखंड टाळाला खंड पडेल. दौलताबादला जनार्दन स्वामी उपोषणं करती, अन् सारी दुनिया या एकनाथाच्या तोंडाला काळं फासून, म्हादबा, माझ्या तोंडात माती की हो घालतील.
म्हादबा : (शोकमग्न, पाय धरतो) या म्हाद्याच्या त्वाण्डात माती पडो. पुन द्येवा, माज्या निरोती गेनबा न् स्वापान मुकताई णामद्यावाच्या नगरं नग इन्टुबा! म्हाराज, या म्हाद्याला द्या सोडून शिम्भार ख्याटरं हाना, पन् या पाप्याला पावन करा जी मायबाप.
एकनाथ : (त्याला उठवून पोटाशी धरतो) उठा उठा महादबा. पश्चातापासारखं दुसरं प्रायश्चित्त नाही. तुम्हा मराठे बांधवांच्या मनावर न् मनगटावर तर साऱ्या दख्खनची मदार! आपले महार-मांगादि अस्पृश्य बांधव तुमच्या इतकेच पराक्रमी, धाडशी न् मनानं पाक प्रामाणिक आहेत. त्यांच्याशी तुम्ही मर्द मराठे जर एकदिलानं वागाल. थोर सरदारी दिलानं त्यांना आपलेसे कराल, तर तुमच्या संघटित सामर्त्याच्या जोरावर ज्ञानबांच्या भागवत धर्माचा भगवा झेंडा त्रिखण्ड दुनियेवर डौलाने फडकू लागेल. इतकंच काय, पण महादबा, मनातलं एक गुपित सांगतो. भावी धर्मराज्याची आशा, तुमच्या जातभाईंच्या मर्दुमकी भोवतीच घुटमळत असलेली मला स्पष्ट दिसत आहे.
अभंग
मराष्ट्रीं मऱ्हाठे प्रबळ होतील ।
अवतार घेतील शंभूदेव ।।१।।
देव देवस्थानें संस्थांना सकळा ।
मऱ्हाठ्यांचा मेळा उद्धरील ।।२।।
कृष्णा कोयनेचे खोरे उफाळेल ।
दक्षिण उजाळेल स्वराज्याने ।।३।।
उभा हिंदुस्थान मऱ्हाठ्यांच्या धाकें ।
वांकवील नाकें आदराने ।।४।।
ध्यानी मनिं स्वप्नीं नाचतें भाकीत ।
ठेवा हे गुपीत मनामाजीं ।।५।।
(पुराणाची पोथी घेऊन गिरजाबाई प्र. करते)
गिरजा : शहरात पुराणाला जायची नाही का वेळी झाली?
एकनाथ : खरंच, हे माझ्या लक्षातच राहिलं नाही (पोथी घेऊन) म्हादबा येता का आमचं बालबोध भागवत ऐकायला?
म्हादबा : लइ आनंदानं, द्येवा, लइ आनंदानं.
गिरजा : अगबाई, म्हादबा पाटील का हे? ओळखूसुद्धा आले नाहीत. काय तुमची दशा ही!
म्हादबा : मातुसरी दण्डवत घ्यावा. (साष्टांग नमस्कार घालतो.)
गिरजा : उठा बरं म्हादबा. उठा. पुराण आटपल्यावर आमच्याकडंच फराळाला या. विठूबाबांना पण भेटा. ते तुमची सारखी आठवण करीत असतात.
एकनाथ : बरं, मी आता पुढं होतो. (जातो.)
गिरजा : काही ही संकोच बाळगू नका बरं. अहो आपण सगळी एकाच मातीची मडकी. काही कच्ची, काही पक्की. इतकंच!
म्हादबा : काय सांगू मातुसरी, माझ्या काळजामंदी औताची पोखरण पडलिया. शरमेनं म्या मेलू पघा. इण्टुबा देवमाणूस. लाखामन्दि न्हाय असा गवसायचा, न्हाय गवसायचा. पुन् म्या डुकार, आक्षी रानडुकार. आताच म्या घरातून आलो. माजी आवा न् समदी कच्चीबच्ची सीताबाय नि इण्टुबाला मायन्दाळ दुवा देत्याति. मला पकडून दौलताबादला नेलाया, तवापून या पैठणच्या एकाबि भटानं न्हाय कवा इचारपूस केली, का म्हादबाची आवा न् कच्चीबच्ची म्येली का जिती हायती! पुनै त्या इण्टुबाच्या सुनबाय सीतामावलीनं-बये तू हाईस तरी कोन? इण्टलाची रकमाय का रामचिन्दराची सीतामाय? – तिनं तडाक् माज्या घरी जाऊनशान माझ्या आवाचं डोळं पुसलं, र दिलाया, पोराबाळांना पोटाशी धरलाय, आन-आन्-मातुसरी काय बोलु! इण्टु एकसरानं डळदाना लाकुडफाटा दुधदुभतं घरपोच पाठवूनशान, गेलं सा म्हइन् माझी कच्चीबच्ची वाचवलीया बया.
गिरजा : म्हादबा पाटील, रडू नका. डोळे पुसा, अहो माणसांनी नाही माणसांच्या उपेगी पडायचं तर कुणी पडायचं?- जा आता पुराणाला न् मुलाबाळांना घेऊनच या फराळाला याल नं? (जाते.)
म्हादबा : (स्व.) थूःत तुझ्या जिनगानीला म्हाद्या! म्हार म्हून ज्येचं तू टक्कुरं फोडलंस, त्येनंच तुझ्या कच्च्याबच्यांना आनपानी द्यावं? काय, हाय काय यो चिमित्कार? इण्टुबा, इण्टु एसकरा, आSSर तू हाइस तरी कोनरं बाबा? इण्टु म्हार? न्हाय न्हाय. तू इण्टु म्हार न्हाईस. राSSजा तू पण्डरीचा इण्टुबाच हाइस.-अदुगर तुज्या पायावर डोई घासतो न् मग यकनाथ द्येवाच्या भागवताला जातो. (जातो.)
अंक २ रा
प्रवेश २ रा
[स्थळ, स्थिति व पात्रे : हिरकणी गायिकेच्या माडीवर नाच गाणे चालू आहे. भडाग्नी, चव्हाटे, भंपकराव, दुलिचन्द मारवाडी, ममदूशेट बसले आहेत. मधोमध चांदीचे तबक ठेवले असून त्यात मधून मधून दौलतजाद्याचे रुपये खणाणत आहेत. हिरकणी खालील लावणी गात, हावभावासह नाचत आहे. – अर्धे अधिक गाणे झाल्यावर केरोबा उठतो. ममदूशेट व दुलिचन्द ‘‘काहो, मध्यन्तरी उठलातसे? बसा.’’. अशा अर्थाची खूण त्याला करतात, कान-जानव्याची खूण करून तो जातो. गाणे नाच चालूच असतो.]
हिरकणी :
लावणी
प्रेमाचि गत न्यारी । गत न्यारी ।।धृ.।।
दोराविण वावडी उडे अन्तराळिं ।
सुराविण संगीत घुमवी गळिं ।
वेलाविण टवटवते नवकळि ।
अशी हि जादुगारी ।।।।
धनाविण खुले फुले रसवन्ति ।
तोल ना मोल सदा यशवन्ति ।
अशि हि सरदारी जादुगारी ।।२।।
प्रेमाचा सौदा नसे बाजारिं ।
मानि ना भाऊ बाप अधिकारिं ।
सतार ती दिसे, असे एकतारि ।
दिलाचि दिलदारी जादुगारी ।।३।।
[गाणे चालले असतानाच बाहेरून ‘‘धावा हो धावा लवकर कोणी तरी धावा.’’ अशी सीतेची किंकाळी ऐकू येते.]
हिरकणी : (चपापून) अगबाई? कुणाची ही किंकाळी! काही तरी दगा दिसतो.
[ती गडबडीने जाऊ पाहते ‘‘कुत्रं केकाटलं-खटाऱ्याचं चाक किकाटलं-मांजरीनं म्यौं म्यौं केलं. – जाऊ द्या बसा. – मरू द्या. एक जीवनपूरी छेडा. – वाटेल तर भैरवी होऊ द्या.’’ असे म्हणून मंडळी तिला आडवतात. नाच गाणे चालू होते. इतक्यात पुन्हा तीच किंकाळी ऐकू येते. ]
हिरकणी : ही पहा पुन्हा किंकाळी! दगाच आहे खास. मला जाऊन पाहिलंच पाहिजे. (गडबडीने जाते.)
[दुलीचन्द, ममदू वगैरे निराशेचे सुस्कारे सोडीत जातात.]
चव्हाटे : राण्डेच्या केऱ्याने तर अतिप्रसंग नाही ना केला?
भडाग्नि : बहा गाढव नेहमी असाच गोंधळ घालतो.
भंपक : काही तरी गोंधळच दिसतोय. आपल्यालाच जाऊन प्रकरण निपटलं पाहिजे. चला चला.
चव्हाटे : चला. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. (सर्व जातात.)
[विस्कटलेले केस मोकळे सुटले आहेत व दम टाकीत आहे,
अशा सीतेला घेऊन हिरकणी येते. तिचे कपडे झाडते व बुचडा बांधते.]
हिरकणी : माझ्या बगिच्यात येऊन असला हलकटपणा करायला या मेल्याला लाज कशी वाटली नाही. – सीताबाई, तुला काही दुखापत तर नाही ना झाली?- चांडाळ मेले गावगुंड! केऱ्या कळसुत्र्या तुझ्या अंगावर हात टाकण्याइतका पाजी असेल, असं नव्हतं बाई मला वाटलं! मेले देवाचे बडवे म्हणवतात न् असली बदकर्म करतात!- पण तुला कुठं लागलं नाही ना?
सीता : थोडा केसांना हिसडा बसला इतकंच. हिराबाई, ऐन वेळेला तुम्ही धावत आलात, म्हणून बरं झालं बरं. नाहीतर माझ्या हातानं आज घात झाला असता.
हिरकणी : तुझ्या हातनं कसचा? त्याच मेल्यानी केला असता. त्यांनी पाळत ठेवून हल्ला केला. तरी म्हटलं, मधीच जलशातनं उठून हा गेला कुठं? मेले देवाचे पुजारी म्हणवतात- [केरोबाचे कान पकडून गावबा प्र. क.]
गावबा : अन् गावाचे शेतखाने उपसतात. काय बडवे महाशय, देवाच्या काकड आरतीची वेळ न् इकडं कुठं अक्कल पाजळायला चुकलात? चोरांनो, पुजारी म्हणून मिरवता, अस्पृश्यांना अन्नदान केलं म्हणून एकनाथांना महार म्हणता. सावकारांकडून त्यांची अब्रू घेता. घरदार लुटवून माणसातनं उठवता. अन् इकडं गोरगरीब पाक पोरीच्या अब्रूवर धाड घालता? बदमाष?
केरोबा : गावबा, कान सोड, मग करतो सगळा खुलासा.
गावबा : आधी आठवली अवदसा नि आता करतोय खुलासा.
हिरकणी : माझ्या बागेत एकटी गाठून, सीताबाईसारख्या अश्राप अनाथ तरुणीच्या अंगावर हात टाकता? केरोबा, मेल्या तू ब्राह्मण का मांग?
गावबा : सीताबाई, बोल. या बडव्याची हाडं उभी चिरू, का आडवी ठेचू?
सीता : गावबा, त्याला सोडून दे.
गावबा : सोडून दे? सोडून देण्यासाठी का मी या देवळी गाढवाला पकडलं? तुझ्या शीलावर यांनी हल्ला करावा -
सीता : हल्ला? अरे माझ्या शीलावर हल्ला करायला कुणाची माय व्याली आहे गावबा. ही सीता म्हणजे पांढरपेशाच्या परसातलं लाजाळूचं झाड का दावणीची गाय समजतोस? म्हारवाड्यातल्या विठू व सकराची सून आहे मी सून. लढाईत मर्दाच्या मरणानं मरून देवाघरी गेलेल्या रामजी शिलेदाराची रण्डकी आवा आहे, मी रण्डकी आवा. खाली बागेत फुलं तोडताना, गैरसावध पाहून यांनी माझ्या अंगावर हात टाकला. पण त्यापुढं याची मजल जाती तर (निरीतून कट्यार काढते) पाहिलीस? पाहिलीस ही?- यावर माझ्या शिलेदाराचं नाव खोदून नगराहून या रण्डकीला आन्दण आली आहे आन्दण. (कट्यार कपाळाला लावून तिचे चुम्बन घेते) या महालक्ष्मीनं या रेड्याच्या काळजाचा ठाव पाहिला असता.
गावबा : हिरकणीबाई, कशी आहे सीता? आहे ना जागती ज्योत भगवदगीता?
सीता : राजे महाराजांच्या महाराण्यांवर बलात्कार होतील, पण महारणीवर हात टाकणाऱ्यांच्या घरातले कुंकवाचे करण्डे पालथे पडतील.
गावबा : ऐकलं का भूदेव? (हिरकणीला) आपण तर भूदेवी. आपल्या मळवटाला नाही कशाची भीती. थरकत घोडा, भडकत निशाण.
सीता : माझी किंकाळी ऐकून हिराबाई जर चटकन धावल्या नसत्या, तर गावबा, माझी एक गरीब बहीण आज फुकट रण्डकी होती बरं. दे त्याला सोडून. पाप्यावर आपण नेहमी दयाच केली पाहिजे.
गावबा : दया केल्याचं दुःख नाही, पण बडवा सोकावतो, त्याची काय वाट?
केरोबा : त्याची वाट आता तडक-घराकडं-घराकडं!
गावबा : घर तर आहेच हो. पण हिराबाईच्या माडीवर थोडा जलसा तर होऊ द्या. मघाशी अर्ध्याच मैफलीतून उठलात. अर्धी बैठक मी पुरी करतो. – हिरकणीबाई, एका. सीता तू पण पहा. या तम्बोऱ्याच्या खुण्ट्या पिरगाळून भैरव रागाचा मी कसा उद्धार करतो तो! टँव् टँव् टँव्SS – अझून झार नाही लागत नीटशी. भोपळा फोडून षडज् ताणला पाहिजे. (केरोबा ‘‘कान सोड’’ ओरडतो) जण्हारी बिघडली वाटतं? हिराबाई, जरा पायतील चप्पल काढून, नाक-बोण्डीची जव्हारी जरा घासून दुरुस्त करा पाहू. (केरोबा मोठ्याने ओरडतो.) हाSS! याला म्हणतात दरबारी कानडा. का लागला का नाही तम्बोरा भरघोस सुरात?
सीता : जाऊ दे रे गावबा, सोड त्याला. असल्या भल्या माणसाची अवहेलना करणं चांगलं का? सोड त्याला.
गावबा : [सोडतो.] जशी तुझधी मर्जी. ए मानवाच्या कारट्या, जा. देवळात बसून रोज अडाण्यांचा उद्धार करतोस. आज वेश्येच्या माडीवर एका म्हारणीनं तुला मोक्ष दिला. चले जावं. का दाखवू थरकत घोडा, भडकत निशाणं.
(केरोबा किंचाळत जातो)
सीता : गावबा, तू रे इकडं कसा आलास?
गावबा : अगं, मी या बडव्याच्या पाळतीवर गेले सहा महिने आहे. – गावडुक्करं घाणखातेऱ्यावरच हटकून सापडायची. म्हणून आज मी हिरकणीच्या माडीनजीकच पाळतीला राहिलो.
हिरकणी : घाणखातेरं? गावबा काय म्हणतोस तू?
गावबा : मी? वेडा, वेड्याचं कराय ऐकता?
हिरकणी : वेडा? तुझ्या वेडातच वेदान्त असतो.
गावबा : वेदान्ती बनले वेडे, म्हणून माझा वेडात वेदान्त रडे. हिरकणीबाई-हिराबाई-हिराजान, सगळे समर्थ तुमचे श्वान. वा! नावाप्रमाणं तुम्ही चमकदार हिरकणी, भेटेल त्याला पाजाल पाणी. मला सगळ्यांनी वेडा ठरवलाच आहे. आहेच मी वेडा. पण हिराबाई, तुमच्या हिरामहालाची ही माडी, म्हणजे या असल्या हलकट पाजी गावगुंडांच्या गुंडगिरीचा अड्डा. न् पैठण शहराच्या कचरपट्टीचा पेटारा असावा? फार शरमेची गोष्ट आहे बुवा. पहा विचार करा. मी काय? ढिल्या डोक्याचा न् ठिसूळ मेंदूचा. अधिक बोलण्याची माझी लायकी नाही. कारण गावबा म्हणजे पैठणचा सार्वजनिक गाढव ठरलेलाच आहे. थरकत घोडा भडकत निशाण.
[जातो.]
हिरकणी : [खेदयुक्त चिंतन] गावडुकरांचं खातेरं—गुंडगिरीचा अड्डा—कचर—पट्टीचा पेटारा--
सीता : हिराबाई, त्या वेड्या गावबाचा बोल काय इतका मनावर घेता? कुठं काय बोलावं नि कसं वागावं, हे किनै त्याला मुळीच कळत नाही. तो अगदी वेडा आहे बरं, अगदी वेडा.
हिरकणी : सीताबाई, शहाण्यांना जरी हा वेडा दिसला, तरी शेकडो वेड्यांना हा शहाणा करील. या वेड्याने आज मला शहाणी केली. माझ्या जातीचं नि जन्माचं पाप त्यांनी मला दाखवलं.
सीता : हिराबाई, गावबासाठी मी तुमच्या पाया पडते. तुमच्या मनाचा मोठेपणा---
हिरकणी : मनाचा मोठेपणा! पण, जनांच्या नीचपणाला त्याचा आम्हाला बिनशर्त कसा बळी द्यावा लागतो, हे गायक समाजात जन्म घेतल्याशिवाय नाही कुणाला उमगायचं सीताबाई. आमच्या दिलाच्या बगिच्यात चारूशीलाच्या कोमळ पाकळ्याची डवरलेली नि सद्भवासनेच्या सुगंधानं दरवळलेली सारी फुलं, दुनियेच्या कामशांतीची प्रेतं शृंगारतात. थोरथोर कविजनांनी मुक्तकंठाने गायलेल्या स्त्रीजातीच्या चारूशीलाच्या रखरखीत निखाऱ्यानंच या आमच्या ऐश्वर्याचा दिमाख रसरसेला आहे……. है ऐश्वर्य…….हा दिमाख……ही संपत्ती.
सीता : काय करणार तुम्ही, हिराबाई?
हिरकणी : आत्ता आत्ता --- जाळून भस्म करणार!
सीता : नि त्याचं पाप माझ्या नि गावबाच्या माथ्यावर?
हिरकणी : नाही. सीते. पांढरपेशांनी अस्पृश्य म्हणून तुम्हाला मसणवटीच्या रहाणीत डांबलं. तरी पतिपत्नी-प्रेम. चारूशीलाची जोपासना, नीतीचा विकास यांना तरी तुम्ही पारखे झाला नाहीत. म्हारवाड्यातसुद्धा कदरबाज पतिव्रता नि शीलासाठी प्राण वेचणारी तुझ्यासारखी स्त्रीरत्नं निपजतात ना? रामजी शिलेदाराच्या नुसत्या नावासाठी –
(सीता आदराने आकाशाला नमस्कार करते.)
--सीताबाई, कठोर वैधव्याचं सतीचं वाण किती आनंदानं नि अभिमानानं तू पाळतेस, हे पाहिलं म्हंजे मला आमच्या जिण्याची अगदी शिसारी येते. असलं जिणं जगण्यापेक्षा---
सीता : काय करणार?
हिरकणी : काय करणार? काय करणार? या पापी ऐश्वर्याची आत्ताच्या आत्ता आग लावून राख करणार.
(आत धावत जाते नि पेटलेला काकडा आणते. तो पाहताच सीता घाबरते नि मोठमोठ्याने आरडाओरडा करते. ‘‘धाव हो धावा-हिराबाई घराला आग लावताहेत—आग आग – यांना कोणीतरी आवरा हो—धावा हो धावा.’’ एकदम गावबा येतो. हिसकाहिसकी करून हिरकणीच्या हातातला काकडा विझवतो नि काढून घेतो. पाठोपाठ एकनाथ येतो.)
एकनाथ : मुली काय चालवलं आहेस हे.
हिरकणी : माझ्या पातकांची राखरांगोळी.
एकनाथ : पातकांची राखरांगोळी घरादाराला आग लावून होत नसते.
हिरकणी : महाराज, महाराज, या अभागणीला वाचवा. पावन करा. सन्मार्गाची वाट दाखवा.
एकनाथ : तुला तुझा हा पातकी संसार जाळायचा आहे ना? अगत्य जाळ.
पद. (चाल – दत्तगुरु दत्तगुरु) राग परज
जाळ संसार हा टाळ घेऊनि करीं ।
चाळ पदिं बांधुनीं माळ गळिं घाल ही ।।धृ.।।
चाळ जाळील तव पापराशी अखिल ।
टाळ हा संचिता लावि टाळा ।।
माळ ही माणसां शिवणी माणुसकी ।
भागवत धर्म हा ज्ञानदेवें दिला।।१।।
अंक दुसरा समाप्त
अंक तिसरा
अंक ३ रा
प्रवेश १ ला
[पांढरे शुभ्र पातळ नेसलेली, केस मोकळे कपाळावर चन्दनी मुद्रा, गळ्यात तुळशीची माळ, उजव्या हातात चिपळ्या, डाव्या हातात लहानसे भगवे निशाण, पायात चाळ अशी हिरकणी एकतनातने भजन गात नाचत प्र. क.]
हिरकणी –
[पद]
असा कसा देवाचा देव बाई ठकडा ।।
देव एक पायाने लंगडा ।। ग बाई एका. ।।धृ।।
गवळ्याघरिं जातो । दहिदुध खातो ।
करि दह्या दुधाचा रबडा । ग बाई. ।।१।।
शिंकेच तोडतो । मडकेच फोडतो ।।
पाडि लोणि ताकाचा सडा, सडा। ग बाई. ।।२।।
वाळवण्टिं जातो । कीर्तन करतो ।।
घेतो साधुसन्तासी झगडा ।। ग बाई. ।।३।।
एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई ।।
देव एकनाथाचा बचडा ।। ग बाई. ।।४।।
विठू : (प्र. क.) ही कोण? – देवी, विठू वेसकराचा दण्डवत घ्यावा. (साष्टांग नमस्कार घालतो. ती डोळे मिटून हात जोडते व ‘‘पुण्डलीक वरदा हाSSSरि विठ्ठल. जनार्दन एकनाथ’’ म्हणते.) ---- माझ्या लंगड्या भगवन्ताच्या प्रेमासाठी विषाचा पेला आनंदानं हासत हासत पिणारी साध्वी मीरा---
हिरकणी : नाही देवा, व्यभिचार-पंकात रुतलेल्या गायिका गायींच्या उद्धारासाठी, गोसावी बनलेली, एकनाथांच्या पायीची पैजार हिरा.
विठू : कोण? आपण हिरकणीबाई?
हिरकणी : हिरकणी! अनीतीच्या तकलादी वैभवाला भाललेली ती हिरकण्णी, विठ्ठल नामाची हिरकणी चावून मागेच मेली. माझा गायिका भगिनींनी, नीतीचा दीप पाजळून, विविहाच्या राजमार्गानं, प्रपंच थाटून परमार्थ साधावा अन् पापी गोमन्तकाचा पुण्यप्रभावी स्यमन्तक करून दाखवावा, म्हणून गळ्यात ही ज्ञानदेवाची माळ घालून, दुनियेपाशी माणुसकीची भीक मागणारी भिकारीण हिरा तुमच्यापुढे उभी आहे. देवा घालता का या भिकारणीला थोडी भीक?
विठू : हिराबाय, तुझ्यासारख्या भाग्यवंत भिकारणीला हा हतभागी काय आपल्या कर्माची भीक घालणार!
हिरकणी : मला तुमच्या कर्माचीच भीक पाहिजे. पैठणभर लाळीच्या रोगानं ढोरं पटापट मरत आहेत----
विठू : नि पडी उचलून शहरसफाई करायला आमची महार मंडळीस साफ नकार देताहेत. या पांढरपेशांनी काय आम्हाला असं माणुसकीनं आजवर वागवलं, तर त्यांची ढोरं ओढायला आम्ही जावं, असं त्यांचं म्हणणं. अडवणूक म्हणजे सोडवणूक नव्हे, असं परोपरीनं त्यांना पटवण्याची मी खूप खटपट केली. पण त्यांचा आपला एकच हेका. काय कराव, सुचत नाही.
हिरकणी : म्हारवाड्यांच्या बिनमोल स्वार्थत्यागानीच गावठाण्यांचे कसबे, कसब्यांचे गाव नि गावांची शहरे झाली नि आजवर टिकली. जनतेच्या आरोग्यासाठी आजवर तुम्ही आपल्या देहमनाचा धुरोळा केलात. आत्ताचा प्रश्न सार्वजनिक आरोग्याचा आहे. ज्यांना माणुसकीची ओळख नाही, अशांना आपणच माणुसकीनं लाजवलं पाहिजे. शिवाय, काही झालं तरी आपण एका गावचे गावकरी. संकटाच्या वेळी सगळी भांडणं नि भेद विसरून, एकमेकांच्या उपयोगी पडण्यातच आपल्या भागवत धर्माचं सार्थक होणार आहे.चला, विचार कसला करता. चला मी येते तुमच्याबरोबर पडी उचलायला. सार्वजनिक संकटाच्या वेळी उच्च नीच भेद बाळगणं मोठं धोक्याचं आहे.
(सीता धावत गडबडीने येते.)
सीता : मामाजी, अहो, इकडे असे विचार करीत काय बसला? गावातली बातमी तरी आहे का?
विठू : आणखी काय भानगड झाली?
सीता : पड्यांची परवड निपटायला एकनाथ महाराजसुद्धा धावले. पाठोपाठ श्रीखंड्या, गावबा, नि तो केरोबा बडवासुद्धा धावत गेला.
विठू : हा विठ्या वेसकर जिवंत असता, माझ्या एकनाथ मायबापाला श्रमसाहास? प्राण देईन (झपाट्याने निघून जातो. पाठोपाठ दोघी जातात.)
(भडाग्नि, चव्हाटे नि भंपकराव बोलत येतात.)
भडाग्नि : आता टाळकं फिरण्याची वेळ आली! पैठण शहर म्हारवाडा बनलं नि म्हारवाड्याला पैठणचं माहात्म्य आलं! एकनाथाच्या पुराणाला राममंदिरात बंदी केली तर सगळं पैठण म्हारवाड्यातल्या विठ्ठलमंदिरात घुसू लागलं! छे! वैतागला जीव! हे प्रकार असेच चालू राहिले तर धर्माचं वाटोळं होऊन तुम्हा आम्हाला शेणगोमुत्राइतकीसुद्धा किंमत राहणार नाही.
चव्हाटे : राहणार नाही कसली? अहो, राहिलीच नाही. भागवत धर्माच्या या नवीन बंडानं तुमच्या आमच्या बायकासुद्धा वेड्या बनल्या. नवऱ्यांना गुंगारा देऊन, खुशाल एकनाथाची पुराणं ऐकायला जातात.
भडाग्नि : पायात चाळ नि हाता टाळ घेऊन, तुमच्या आमच्यापुढं ग्यान्बा एकनाथचे जलशे नाचवायचेच काय ते बाकी उरलं आहे.
चव्हाटे : विठ्ठल नामघोषाचाच महिमा वाढल्यामुळे, वैदिक क्रियाकर्मान्तरावरचा लोकांचा विश्वास अज्जिबात उडाला नि आमच्या पोटावर बिब्बा पडला. काय करावं, काही सुचत नाही.
भंपक : मला विशेष संताप कशाचा आला असेल तर या एकनाथी खटपटीनं ब्राह्मण-भोजनाचा प्रघात बंद पडून, म्हारमांगांदि भिकारड्यांना सुग्रास अन्नदान सुरू झालं, याचा. जे हरामखोर पूर्वी आमच्या उष्ट्या खरकट्यासाठी कावळ्यासारखे जमायचे, ते राण्डलेक गावातली मेलेली ढोरंसुद्धा ओढायला अळम् टळम् करतात! आमच्या भोजनाच्या जन्मसिद्ध हक्कावर कुणी गदा आणील, तर त्याच्या नरडीचा मी घोट घेईन!
चव्हाटे : या पाजी एकनाथाचा काटा आपल्याला उखडलाच पाहिजे.
भंपक : त्या विठ्यालाच चांगला ठेचून चेचून जमीनदोस्त केला पाहिजे.
भडाग्नि : जमीनदोस्त करायचा कुणी? तुम्ही, मी का चव्हाट्यांनी? दर्भ मंत्रून त्रिभुवनाची होळी करण्याचं आपंल तेज आता फक्त पुराणातच पाहून घ्यावं
भंपक : त्या युगाची आठवण झाली की पुरणपोळ्यांच्या भरगच्च भोजनाचे उम्हासे येऊ लागतात आहा! काय तो काल! काय ते युग! नि केवढा त्याचा महिमा! कालाय तस्मै नमः!
चव्हाटे : ‘परस्पर पावणेतेरा’ एवढंच शस्त्र सध्या कलियुगात आपल्यापाशी उरलं आहे. पण ते सुद्धा या एकनाथानं अगदी बोथट पाडलं. महिन्यापूर्वी त्या गेन्या जन्या मांगांना, हे दोन काटे उखडण्यासाठी, पन्नास रुपये देऊन फितवण्याची थोडी का खटपट केली? पण मेल्या मारल्या ते तयारच होत ना! राण्डलेक मांगसुद्धा अलिकडे सात्विकपणात आम्हाला लाजवू लागले आहेत.
भंपक : (चिडून) त्या मांगांना म्हणावं, व्हा तुम्ही ब्राह्मण. आम्ही होतो मांग. रोख पैसे घेऊन माणसांचे खून पाडीत नाहीत ते मांग कसचे? त्यापेक्षा आम्ही बरे!—त्या एक्यानं ब्राह्मणेतरांना तर बगलेत मारलंच मारलं. पण पाहिलात ना आत्ताचा प्रकार? त्या गोवेकरणी राण्डानाही चिथावून पैठणातून पळवल्या.
भडाग्नि : या हिरकणीनं तर काय मीराबाईचं अवसान आणलंय, गळ्यात लाकडाची माळ अडकवून, हातात टाळ घेतला नि ‘‘सगळ्या गोवेकरणींनी लग्ने लावावी, शंछार थाटावा, धंदा बंद करावा.’’ असला उपदेश करीत गावोगाव ती भटकू लागली आहे. पैठणचा सारा आनंदी बाजार ओस पडला.
भंपक : राज्यकर्ते तर विधर्मीच. पण परमेश्वरा, तुला हा अनाचार पाहवतो तरी कसा रे बाबा! दिवसाची प्रपंचाची दगदग उरकल्यावर, रात्री घटकाभर कुठं थोडी करमणुकीची-विरंगुळ्याची-सोय होती. तिलासुद्धा त्या एक्यानं भडाग्नी दिला. जिवाचा अस्सा संताप होतो का एकदम कुठंतरी काहीतरी कसंतरी करावं नि त्यात गुपचुप मरून जावं.
चव्हाटे : हां हां हां भंपकराव, काय हा अविचार, कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम्?
भडाग्नि : अनार्यजुष्टम्! अस्वर्गम्! अकीर्तिकरम्! काय हे, असे अर्जुनासारखे हातपाय गाळून काय होणार? पैठणकराला तरी हे शोभत नाही. शारीरिक शक्तीनं आम्ही कमजोर असलो, तरी आमच्या या डोक्याच्या युक्तीपुढं ब्रह्मदेवाच्या चार डोक्यांनाही नाकं घासावी लागतील नाकं.
चव्हाटे : एकनाथाचा बंदोबस्त करायला काशीक्षेत्राहून आज्ञापत्र मागवलं आहे ना? चारदोन दिसात ते आलं, की मोडल्याच एक्याच्या नांग्या.
भंपक : कर्माच्या मोडतात नांग्या! ते आज्ञापत्र काय करणार? एकनाथाला वाळीत टाकणारं. तो बेटा आधीच आपणहून वाळीत जाऊन बसलाय्. आज्ञापत्र त्याचं आणखीन काय वाकडं करणार? आज्ञापत्राचे न् मानपत्रांचे हे पोरकट चाळे! अशानी तो म्हसोबा थोडाच वंगणार? विंचू दिंडीवर असो, नाहीतर पिंडीवर असो, नालबंद खेटरानी ठेचल्याशिवाय काय होणार? म्हणजे आज्ञापत्र यांच्या नांग्या मोडणार! वेदांची बासुंदी आटवून तुमच्या बुद्धीचा खवा झालाय खवा, भडाग्नि चव्हाटे.
चव्हाटे : वेदान्त-व्यसनानं बुद्धीला जाड्य येणं क्रमशक्य आहे. आमच्या बुद्धीचा झाला खवा पण भंपकराव, तुमच्या अकलेचा इतका तापला तवा, तर त्यावर भाजला आहात का एकाद्या बिनतोड युक्तीचा रवा?
भडाग्नि : का उगाच तोंडची हवा, न भंपकरावाची गवगवा.
भंपक : रवा भाजून शिरा केल्याशिवाय गवगवा करणारा हा भंपकराव नव्हे. माझ्या युक्तीचा शिरा, त्या एकनाथाच्या काळजात शिरून, विठ्या महाराच्या घोडशिरा तोडायला झाला गेला, अहमदनगरला जाऊन पोचला.
भडाग्नि, चव्हाटे : काय म्हणता, काय म्हणता भंपकराव? तुमचा शिरा नगरात शिरला?
भंपक : उगाच नाही. दररोज सकाळी चार डिंकाचे लाडू, वेळणीभर चमचमीत तुपाचा शिरा दोन शेर आटीव दूध अन् वर जोंधळ्याची खरपूस भाजलेली भाकरी चावतो, नि मग डोळे उघडून उजाडल्याची चौकशी करतो. अहो, त्या म्हादबा पाटलाला बनवला न दिली सुरुंगाची रंजुक शिलगाऊन न काय?
चव्हाटे : म्हादबाला बनवला? वाहवा! वाहवा! याला म्हणतात विराट पुरषस्य शीर्षम्.
भडाग्नि : तो माळकरी मरगट्टा बनला बरा?
भंपक : अहो हे मराठे मनगटानं दणगट असले, तरी मनानं अगदीच कळकट फार ठिसूळ, दमडीच्या गाजांत सारा गाव डोक्यावर घेतील.
भडाग्नि : मला नाही बुवा या म्हादबाचा विश्वास! पक्का थिल्लर! कैदेतनं सुटून आल्यावर एकनाथाच्या सावलीत गेला, न विठू महाराच्या गळ्यात गळा घालून बागडू लागला. विठु महार म्हणजे पंढरीचा विठोबा अन् एकनाथ म्हणजे ज्ञानेश्वराचा अवतार. असा साऱ्या गावभर शंख करीत फिरू लागला जसा रंग तसा याचा ढंग!
भंपक : हे काय लहानसान भांडवल समजला की काय? सध्या पैठणभर गुराढोरावर आलाय लाळीचा रोग. ही संधी साधून त्या बावळट म्हादबाला परवा द्वादशीचा पारण्याला घरी जेवावयाला बोलवलं. काटकोनात पाट मांडून पंक्तीचा देखावा केला. बेत अगदी साधा पण निर्लेप भात, वरण, तूप, भाजी, भाकरी, आमटी, लोणचं-सगळं दुधात शिजवलं. पाण्याचा स्पर्श नाही. भरगच्च जेवण झाल्यावर, चम्पक, चिमाबाई शिलगावली न दोघांनी मनमुराद-हूं! भर रंगात आल्यावर, चंचुप्रवेशे मुसलप्रवेशः!
भडाग्नि, चव्हाटे : मुसलप्रवेश? वाहवा! कसा काय केला बुवा मुसलप्रवेश.
भंपक : धी तो थोडासा आपल्यावर गुरगुरला मी म्हटलं म्हदाबा, कैदेची शिक्षा झालेल्याची पाटीलकी जाते. पण आम्ही सगळ्या पैठणकर ब्राह्मणांनी थेट दरबारपर्यंत खटपटी करून, तुमची पाटीलकी टिकवली. नाहीतर आज तुमची अन्नान्न दशा झाली असती. या तोडग्यानं तो कोडगा खुलला. मग काढली ढोरांची साथ. म्हणलं म्हादबा, गावात ढोरं कशी मरताहेत ती पाहिलीत ना? अहो ढोरं आपल्याला पोरासारखी, पण ही म्हारडी मांगडी त्यांना धडाधड विष घालून ठार मारताहेत. रोग कसला नं राई कसली. सगळी एकनाथी बतावणी. बरं ढोरं तर फटाफट मरताहेत. न पडी उचलायला एकही महारडा येत नाही. तुम्ही तर गावचे पाटील अशावेळी नुसती माळ घालून टाळ कुटीत बसाल, तर पाटीलकीला मुकाल. हे ऐकताच ते बावळट भेदरलं न् लागलं गयावया करायला - ‘येस्नि उपाय काइ’ म्हणून आमच्याजवळ अर्ज लिहून होताच तयार. त्यावर घेतली त्याची सही न दिला एकदम दीक्षितांच्या वामन्याबरोबर नगरला पाठवून, त्यावर कोतवालीकडे फर्मानंसुद्धा आलं. चला.
भडाग्नि, चव्हाटे : योग्य, वाजवी, रास्त! परस्पर पावणेतेरा!
(जातात)
अंक ३ रा
प्रवेश २ रा
[प्रथम काही वेळ चाबकाचे फटकारे ऐकू येतात. ‘‘बोल, ढोरांना विष घातलं का नाही? हरामखोर, आता का दातखिळी बसली? बोलतोस का नाही?’’ असे कोतवालाचे धमकावणीचे शब्द ऐकू येतात. मग पडदा वर जातो. विठूला दोरानी हातपाय बांधून उभा केला आहे नि कोतवाल मार देत आहे. आजूबाजूला भडाग्नी, चव्हाटे, भंपकराव कोतवालाला चिथावण्या देत उभे आहेत. कोतवाल एक दोन फटकारे मारतो, तोच, ‘कोतवाल’ अशी एकनाथाची हबकणीची आरोळी लांबून ऐकू येते, ती ऐकताच ‘‘अरे बापरे! एकनाथच आला वाटतं! होय तोच. पळा.’’ असे म्हणत तिघेही भटजी पळून जातात. संतप्त एकनाथ हिरकणीसह येतो. एकनाथाला पाहताच कोतवाल चाबूक टाकून त्याला मुजरा करतो. हिरकणी विठूला बांधलेले दोर सोडवून, त्याला सावरते, वारा घालते, रक्त पुसते.]
एकनाथ : कोतवाल, काय हा त्याचार चालवलाहात तुम्ही. निरपराध्याला चौकशीवाचून असली हाणमार करता? मुर्तूजा निजामशहाच्या राज्यात अझून मोगलाई नाही चालू झाली. समजलात! विठोबानं काय कुणाचं घोडं मारलं?
कोतवाल : (मुजरा करून) घोडं नाही मारलं. विष घालून गावातली ढोरं मारली न् सारी पडी कुझत ठेवली. हा अर्ज वाचा म्हणजे खात्री होईल. (अर्ज देतो. एकनाथ वाचतो.) प्रकरण वरून आलेलं. मला चौकशी केलीच पाहिजे.
एकनाथ : हा म्हादबा पाटलाचा अर्ज!
कोतवाल : थेट शहाकडून खास चौकशीसाठी आलाय. दादो नरसू कोळ्यांची त्यावर मखलाशी आहे, माझा काय इलाज?
एकनाथ : माझा काय इलाज? लाज वाटत नाही, कोतवाल असं बोलायला तुम्हाला? दादु काळे झाले काय, अन् मेहेरबान शहासाहेब झाले काय, पन्नास कोसावरचे अधिकारी. पैठणच्या खऱ्या हकिकती त्यांना कशा कळणार? वहिवाटीप्रमाणे आलेला अर्ज त्यांनी इकडे चौकशीसाठी पाठवला. पण तुम्ही तर पैठणलाच राहता ना? डोळे उघडे ठेवूनच कोतवाली करता ना? महाराणी वीष घालून गावातली ढोरं मारली म्हणावी, तर खुद्द म्हारवाड्यातली ढोरं कशानं मरताहेत? तुम्हाला ठाऊक असलंच पाहिजे, का गेली आठ वर्ष पैठणचे म्हार मांग धेड-कुणीही-मेलेल्या जनावराचं मास मुळीच खात नाहीत. कित्येक तर मासमच्छी दारूला सुद्धा शिवत नाहीत. मग त्यांना ढोर मारण्याची जरूर काय? हे तुम्हाला उमजायला हवं होतं. कुणातरी दुस्मानानं हवे ते खोडसाळ अर्ज वर पाठवले न् ते खाली चौकशीला आले, म्हणजे त्यातला प्रत्येक शब्द खरा मानून, स्थानिक अधिकारी वाटेल त्याला फासावर चढू लागले. तर ती चौकशी, माणुसकी, का न्यायाचे धिंडवडे?
कोतवाल : ढोरं कशानेही मरोत, त्यांची पडी उचलायला महारानी नकार का दिला? वेसकराची फूस असल्याशिवाय?
एकनाथ : पडी ओढायला महार आले नाहीत, तरी गावात पडी कुझत पडली का? केलात तपास तुम्ही? का इथंच चावडीवर बसून चौकशीच्या वावड्या उडवल्या? कोतवाल, लक्षात ठेवा, साऱ्या म्हारानी जरी साफ नकार दिला, तरी या या विठोबा वेसकरानं, अन्नपाण्याची पर्वा न करता, रात्रंदिवस श्रमून, शहरातली सगळी मेलेली ढोरं ओढून टाकलेली आहेत, समजलात! सीता न् हिरकणी या दोन मुलींनी, अन् गावबा न् केरोबानी याला मदत केली. शहरचे कोतवाल म्हणवता, न् या गोष्टी तुम्हाला, कशा दिसल्या नाहीत. शहराच्या आरोग्यासाठी या मंडळीनं हे घाणेरडं काम केलं नसतं, तर आजला सारं पैठण एकाद्या रोगाच्या साथीनं उध्वस्त झालं असतं. लोकहिताच्या या बिनपगारी कामगिरीबद्दल विठोबाला बक्षिसी काय? तर त्याला चावडीवर आणून सर्व पैठणकरांसमोर ढोरासारखा बडवता? रक्तबंबाळ होईसा चाबकानी सडकता?
कोतवाल : पण विठोबानी या गोष्टी आधी मला सांगितल्या असत्या ---
एकनाथ : सांगायच्या कशाला? दिसत नाहीत तुम्हाला? अझून दिसत नसेल, तर मी दाखवितो तुम्हाला. या एकनाथाला केवळ दर्भधारी दक्षिणापान्त भिक्षूक समजू नका. सात्त्विकपणाचा मला कितीही हव्यास असला, तरी आजच्या सारख्या रानटी अन्यायांना पायबंद ठोकण्यासाठी तामसी वृत्तीला मनमुराद मोकळी सोडायला हा एकनाथ कमी करणार नाही. थांबा, आजच्या या पाशवी प्रकाराबद्दल मीच दरबारकडे तक्रार अर्ज पाठवून, तुम्हाला माणुसकीचा धडा शिकवतो.
कोतवाल : (एकनाथांचे पाय धरून) सरदारसाहेब, माझ्या हातून फार मोठी चूक झाली. क्षमा करणार खावन्द समर्थ.
(म्हादबा येतो.)
म्हादबा : आं! यो हाय काय परकार? अन् इण्टुबा, आं! तुमास्नी आसं कुनि मारलाया?
कोतवाल : हा पहा तो पाजी अर्जदार, गावचा पाटील म्हणवतो न् बादशहाकडे खोटे अर्ज पाठवतो.
एकनाथ : म्हादबा पाटील, बादशहाकडे तुम्हीच हा अर्ज पाठवला होता?
म्हादबा : अर्जी व्हय? म्या काय लिवनार हाई, तर अर्जी लिवनार?
एकनाथ : विठू वेसकराविरुद्ध केलेल्या या अर्जावर तुमची सही आहे की नाही?
म्हादबा : मला फकात सयी लिवाया येती. पुन अर्जी—अन् ती इण्टु एसकरा इरुध? कशापायी लिवणार जी? हाय काय यो समदा परकार?
एकनाथ : तुमच्या या खोडसाळ अर्जानं विठू वेसकराची सालटी सोलून काढली. आहात का या पापाला जबाबदार तुम्ही?--- हा घ्या अर्ज (देतो.) अन् सांगा खरं काय ते.
म्हादबा : (डोके खाजवीत) ही अर्जी यो कागूद हां आलं अक्षि, ध्येनामंदी. गावामन्दी ढोरावर रोग आलाया, तवा त्येचा काइ दवापानी सरकारनी तुरुत पाठवूनशान द्यावं, म्हून या अर्जीवर त्या भंपकरावान् माझी सही लिहूनशान घेतली व्हती. पुन् इण्टुबाबाच्या इरुध येच्यामन्दी कायबी असाल, तर म्हाराज, ग्येन्बाच्या या माळेच्यान्, मुर्दाड भंपकरावान् समदा घात केला, ---अरारारारा! ही काय मानसं हायती, का हायती तरी कोन! (विठोबाच्या पाया पडून) इण्टुबाबा, म्या असं वंगाळ काम कवा करीन कारे! अरारा, माज्यापायी तुजं असं धिण्डावडं निघावं, अन् त्ये या म्हाद्यानं बघावं! रगातपिती उठाल माज्या आंगावर!
एकनाथ : (शांत होऊन) झाला सगळा खुलासा, तुम्हाला कळला ना कोतवाल? हात जोडण्याचं काही कारण नाही. मी आता शांत झालो. हे प्रकरण आता इथंच गतीला गेलं. योग्य तो खुलासा लिहून, अर्ज परत वर पाठवा न् स्वस्थ रहा. (अर्ज घेऊन मुजरा करून कोतवाल जातो.)
म्हादबा : महाराजा, माज्या सयीनं माज्या इण्टुबाच्या आंगातून रगात काडलं. (पायावर पडतो.) आपल्या पाइच्या ख्येटरानं या म्हाद्याचं टक्कुरं फोडा. न्हायतर सयी करनारा यो हात इळ्यानं तोडा.
एकनाथ : म्हादबा, उठा दोष तुमचा नाहीय या पापाला तुमचा अडाणीपणा कारण आहे. त्यामुळे शत्रुमित्राची पारख तुम्हाला नीट होत नाही.
म्हादबा : (उठून) मुर्दाड भंपकरावान् समदा घात केला यो.
एकनाथ : त्यांनाही दोष कशाला द्या. दोष आपला. कवण्ढळापासून गोडीची अपेक्षा करणं मूर्खपणाचं आहे. (विठूजवळ जाऊन) विठ्ठला, तुला या अवस्थेत पाहून मला फार फार समाधान वाटतं---फार समाधान वाटतं. समाजाच्या आत्मोद्धारासाठी कसलं लेणं अंगावर चढवून घ्यावं लागतं, हे अस्सं पाहिलं, म्हणजे, जगदुद्धारासाठी भगवंतांना किती श्रम सायास सोसावे लागत असतील, याची छान कल्पना येते. चाबकाच्या तडाक्यांनी तुझ्या अंगातून रक्ताच्या चिळकाण्ड्या उडत असताना, तू जी धीरगंभीर वृत्ती कायम ठेवलीस, ती पाहून पंढरीचा राणा विटेवर थै थै नाचला असेल बरं. असले प्रकार पाहताना वाईट वाटतं खरं, पण ते पाहण्याचं भाग्य लाभणं सुद्धा कठीण बरं! विठोबा काय कमी ताकदीचा माणूस आहे? एका चफराकीत कोतवाल चावडी यानं उधळून लावली असती. पण ती पाशवी शक्ती! प्रतिकाराची भरपूर धमक असतानाच विरोधकाचे हवे ते अत्याचार निमूटपणानं सहन करण्यातच दैवी शक्तीचा विकास होतो, विठ्ठला, तो तू छान केलास, मला आनंद झाला. अस्पृश्यांच्या उद्धाराच्या प्रश्नाचं महत्त्व आज सिद्ध झालं. जसजसा विरोधाचा जोर वाढत जातो, तसतशी आपल्या कार्याच्या यशाची खूणगाठ घट्ट बसत जाते बरं चल, पंढरीनाथाच्या पायावर डोके ठेवून, आजच सारं पुण्य श्रीकृष्णार्पणमस्तु करून टाक.
(सर्व जातात.)
अंक ३ रा
प्रवेश ३ रा
[पगडी उपरण्याचा उत्तम पोषाख केलेले भडाग्नि, चव्हाटे, भंपकराव प्र. क.]
भडाग्नि : (दूर पाहून) झाली ही व्यवस्था उत्तम-अगदी मनपसंत झाली. गावाबाहेर-थण्डगार आमराईत-हवाशीर. अगदी मनपसन्त काशीक्षेत्रातून एवढे मोठे प्रचंड विद्वान धर्ममार्तण्ड स्वामी येणार, एकनाथाच्या धर्मभ्रष्टतेची जाहीर चौकशी करणार, त्यांना गरुडमण्डपाच्या आटोपशीर जागेत कोंबण्यात अर्थच नव्हता. ब्राह्मण, ब्राह्मणेतर, अस्पृश्य, अलम् दुनियेपुढंच त्या एक्याची जाहीर चौकशी न् नाचक्की व्हायला पाहिजे.
चव्हाटे : हजार खटपटी करून आपण काशीकर स्वामींना पैठणला आणलं. त्यांनी एकनाथाचे अपराध त्याच्या पदरात बांधले. तरी ते त्याला काय शिक्षा सांगणार?
भडाग्नि : काय सांगणार म्हणजे? देहान्त प्रायश्चित्त!
चव्हाटे : देहान्त प्रायश्चित्त! भडाग्नि बोजवारे, तुमची सारी अक्कल अग्निहोत्ताराच्या कुण्डात जळून राख झाली आहे राख. अहो, पैठणात धर्ममार्तण्ड म्हणून मिरवतात. अन् पुराण प्रवचनात ब्रह्मदेवाच्या चारी दाढ्या गदगदा हालवण्याचं मोठ्ठं अवसान आणलंत, तरी तुमच्या धर्मराज्याची शेंडी मुसलमानी राजधर्माच्या हातात आहे. तुम्ही मेलेले गुलाम काय त्याला देहान्त प्रायश्चित्त देणार हो!
भंपक : [उसासा टाकून] राज्यत्ता तिच्या शिवाय आमची सत्ता, केवळ विधवा---अगदी अस्त्रायफट् विधवा होऊन बसली आहे! आमचे शापसुद्धा ढेकरासारखे हवेतल्या हवेत नाहीसे होतात!
चव्हाटे : शिवाय, एकनाथ कितीही कंगाल स्थिती राहत असला तरी तो सरदार आहे, सारी रयत त्याच्या भजनी लागलेली---परवाच्या अर्जाचं प्रकरण त्यानं थेट वर पाठवलं असतं, तर कोतवालाची कोतवाली जाऊन, भंपकराव, तुम्हाला कोतवार चावडी गाठावी लागती. म्हणे दादो नरसू काळ्यांचा वशिला! काय चाटायचा!
भंपक : अहो, प्रयत्ने वाळूचे--! नाही गळलं तेल, तर नाही. गळवाला तम्बडी तर लावून पहावी.
(आत गावबा – तुम्बडी भरदे मेरि तुम्बडी भर दे.)
भंपक : हा कोण आला तुम्बडी भरदे वाला!
भडाग्नि : अँ! अहो तो आपला वेडा-गावबा.
चव्हाटे : वेडा? घालवेडा आहे लेकाचा. शालजोडीतले देण्यात फार पटाईत.
भंपक : वाजवा म्हणावं तुम्बड्या न् उडवा शालजोड्या – आज संध्याकाळपर्यंत!
भडाग्नि, चव्हाटे : संध्याकाळपर्यंत? म्हणजे?
भंपक : अहो ती आज्ञापत्रं न् स्वामी, काय यांच्या धुडगुसाचा बंदोबस्त करणार! हा म्हारवाडाच जाळून फस्त केला पाहिजे. सभेची नांदी तुम्ही करा हवी तशी. भरतवाक्याचा बार हा भंपकराव कसा उडवतो ते पाहून घ्या. भरिताच्या वांग्यासारखा सारा म्हारवाडा भाजून काढतो.
(तुम्बडी वाजवीत गावबा प्रवेश करतो.)
[पायात लालभडक दक्षिणी जोडा, रेशीमकाठी धोतर, अंगात मुसलमानी धर्तीचा पातळ सदरा, जरतारी हिरवे जाकीट, त्यात लाल रेशमी रुमाल गळ्याशी कोंबलेला, कपाळावर पांढऱ्या गंधाचा रुपयाएवढा टिकला. डोक्यावर मळकट महारी पागोट्याची पट्ट्या सुटलेली थप्पी. हातात नारळाची तुम्बडी घेऊन गावबा प्र. क.]
गावबा :
तुम्बडी भरदे । मेरी तुम्बडी भरदे ।।धृ.।।
एक—दोन्—तीन्—
तीन मिले नाना । उनका नाम नहि लेना ।
ऐसा चालु है जमाना । मेरि तुम्बडी. ।।१।।
खाते घी शक्क रोटी । मूमे बात बडि मीठी ।।
जालिम जेहर उन्के पोटी । मेरि. ।।२।।
कहते अछूत मेरा भाई । और गाय मेरी माई ।
ए तो धरमके कसाई । मेरि. ।।३।।
स्वामि दौड आये काशी । कहते नाथ जाव फाशी ।
नाकीं शिरली गांधील माशी । मेरि. ।।४।।
भंपक : काय गावबा, भाद्रपदातच कशाला हा शिमगा?
गावबा : गावच्या पितरपाखात भटांची दिवाळी, म्हणून भटांच्या भाद्रपदात गावबाचा शिमगा---अहो तुम्ही इकडं जामानिमा करून निघालात, पण तिकडं सारा प्रलय झाला ना----अहो असं तोंड वासून काय पाहता? डोळे वासून पाहा. सगळा घोटाळा---ब्रह्मघोटाळा झाला.
तिघेजण : कसला घोटाळा? झालं तरी काय? का पैठण पेटलं?
गावबा : पैठण पेटतं तर त्यावर माझी गुडगुडी नसती का शिलगावली?---पण इकडं तर सारा ब्रह्मघोटाळा---विराट पुरुषाच्या तंगड्या वर झाल्या ना?
तिघेजण : विराट पुरुषाच्या तंगड्या वर झाल्या?
गावबा : अगदी! खाली डोकं वर पाय वेद करति हायहाय । ।भटं रडति धायधाय । तुंबडी ।। दिसत नाही तुम्हाला? पडसं आलंय तुमच्या डोळ्यांना? चांभाराकडून डोळ्यांना गोठ मारून घ्या. (वसानात) हा पहा, तुमचा-सगळ्या दुनियेचा बाप—विराटपुरुष तुमच्या पुढं उभा आहे. वेदातलं चित्र पहा न् हे चित्र पहा---
पावमे बम्मन । शिरपूर अछूत ।
बीच घुसे बिसमिल्ला ।।
कहे गावबा, सुनरि गव्हारो ।
खतम् अकलका किल्ला ।।१।।
--काय? फुटतात का अकलेला फान्दे? नाही? वठलेल्या वडाच्या पारम्ब्या आहात सगळे!
भंपक : मूर्ख आहेस तू.
गावबा : मी मूर्ख नसतो तर तुमचा शहाणपणा उकीरड्यावर गेला असता! विराटपुरुषाच्या तंगड्या वर झाल्या, तरी तुम्ही अझून पायानीच चालता? डोकं चालवा, डोकं चालवा. नाही चालत? शहाणे कशाला म्हणवता हो?---
बनला लठ्ठ बोके । डोके झाले तुमचे खोके ।
पाडलि वाळविनी भोके । मेरी. ।।१।।
डोका चलाव मेरे यार । निकालो अक्कलकी हतियार ।
नहि तो काळ करे बेजार । मेरी. ।।२।।
--अहो, ब्रह्मदेवाचे औरस लेक गेले आता उडत – रावणाच्या लंकेत. अस्पृश्य शूद्र चढले गौरीशंकराच्या टाळक्यावर. अन् मधी घुसलं हे इस्लामी राजसत्तेचं पुरण! भंपकराव, कसा काय आहे हा पुरणपोळीचा बेत!
भंपक : आमचा विरटपुरुश असा नाहीच मुळी.
गावबा : हो हो, खरंच. तुमचा विराटपुरुष म्हणजे शूद्र तंगड्यानाच चिकटलेलं भटी डोकं. सत्ययुगाच्या फासात मुण्डकं लटकावून कलियुगाच्या खातेऱ्यात तंगडझाड करणारा! कम्बरेला मुण्डकं चिकटवण्याची मी खूप खटपट केली होत, पण काही केल्या छातिपोटाची अडगळच निघेना.
भंपक : म्हणून काय, वैदिक विराटपुरुषाच्या पोटात हे इस्लामी पुरण भरायचं? गाढव.
गावबा : गाढव?---
सुनो गद्धेकि गवाई । क्षत्रिय वैश्य जगिं नाही ।
ऐसा कहते बम्मन भाई । मेरि. ।।१।।
चढा छातीपर इस्लाम । चालता पैजारका पैगाम ।
बम्मन बोले रामराम । मेरि. ।।२।।
देखा एकनाथका दण्ड । सैतान हुवा मुर्दा थण्ड ।
ये है पुरणपोळिका बण्ड । मेरि. ।।३।।
भंपक : छान, छान शिमग्याचं सोंग काढलंस, गावबा.
गावबा : वेदापासून पंचगव्यापर्यंत सगळाच शिमगा. त्याला साजं शोभेसं नको का आपण वागायला?
भंपक : आणि अशा सोंगानं का तू सभेला निघालास गाढवा!
गावबा : पाजी-मूर्ख-वेडा! (जातात)
गावबा :
वेडा खाई पेढा । त्याचा बोल बाका तेढा ।
वेदघोष करि रेडा । त्याची शंका सारे फेडा । मेरिं. ।।२।।
(स्व.) आजच्या या सभेच्या पोटात आणखी कसलं तरी काळकूट असलं पाहिजे. त्या केरोबाला मी पाळतीवर ठेवलाच आहे. मी वेडा कायरे? ठीक आहे शहाण्यांनो, दाखवीन या वेड्यांचा इंगा!
(जातो.)
अंक ३ रा]
[प्रवेश ४ था
[आम्बराईत सार्वजनिक सभा. उच्चासनी काशीकर स्वामी. एका बाजूला भडाग्नि प्रभृती ब्राह्मण, दुसरीकडे म्हादबा, गावबा. दूर बाजूला विठू महार वगैरे, एकनाथ उभा आहे.]
भडाग्नि : एकनाथ, या महासभेपुढं तू आरोपी आहेस. काशीक्षेत्राहून स्वामीमहाराज ब्रह्मवृंदांचं आज्ञापत्र घेऊन आले आहेत.
एकनाथ : संतांचं आज्ञापत्र मला शिरसावंद्य आहे.
स्वामी : मऱ्हाठी भाषेत भागवतादि पुराणं रचून, प्राचीन देववाणीचा—संस्कृत भाषेचा---तू अनादर करीत आहेस. ब्रह्मविद्येला प्राकृताच्या चव्हाट्यावर मांडून, तिच्या गूढ पावित्र्याला तू कवडीमोल ठरवीत आहेस.
एकनाथ : ब्रह्मविद्येला साधा सुटसुटीत मऱ्हाठी पेहराव चढवून तिला बालबोध करण्याचा मान माझा नव्हे. पावणेतीनशे वर्षापूर्वीच श्रीज्ञानेश्वर महाराजांनी या पुण्यप्रघाताचा पाया घातला.
चव्हाटे : ब्राह्मणेतरांना ब्रह्मविद्या शिकवणं महापाप आहे.
एकनाथ : ज्ञान हेच अत्यंत पवित्र, मग त्याचा प्रसारच तेवढा महापाप कसा ठरणार? स्वामी महाराज, ब्रह्मज्ञान म्हणजे एकट्या ब्राह्मणाचीच मिरास नव्हे. अलम दुनियेची त्याजवर सारखीच सत्ता आहे.
गावबा : स्वामीमहाराज, संस्कृताच्या तळघरात ब्रह्मविद्येला भटी सवळ्याची बुरशी चढली, म्हणून ज्ञानोबांनी मऱ्हाठीच्या मैदानावर तिचे हातपाय ताणून वाळत घातली. यात या भटांच्या नाकात झुरळं शिरायला काय झालं हो?
चव्हाटे : एकनाथ. काशिक्षेत्रस्थ पंडितांची आज्ञा आहे ---
(पदराखालची पोथी घेऊन गिरजा प्र.क.)
गिरजा : त्यांची काय आज्ञा आहे? (ब्राह्मण मंडळीत ‘‘ही आली महाराची महारीण’’ अशी हळू, पण गिरजेला ऐकू जाईल अशी कुजबूज होते.)
गिरजा : आपण माझा सन्मान करीत आहात बरं! स्वामी महाराज –
मी महारीण नव्हे लानसान ।
म्याच उपटिले त्रिमूर्तीचे कान ।
निर्गुणाचे केले सगुण ।
आले की जी मायबाप ।।
(नमस्कार करते.)
भडाग्नि : एकनाथानं लिहिलेले भागवतपुराण नष्ट करण्यासाठी स्वामीमहाराजांच्या चरणी अर्पण करावं.
गिरजा : भागवत पुराणानं काय पाप केलं?
भडाग्नि : पाप? महत्पाप ते मऱ्हाठी आहे, गीर्वाण नाही.
एकनाथ : गीर्वाण भाषा देवे केली, अन् मऱ्हाठी काय चोरे आणली? ग्रंथ नष्ट केला, म्हणजे माझं भागवत नष्ट होईल, अशी का सगळ्यांची समजूत आहे?
चव्हाटे : प्रश्न आज्ञापत्राचा आहे, समजुतीचा नाही.
एकनाथ : नुसत्या पोथीनंच संतांचं समाधान होत असलं तर---?
गिरजा : (पोथी पुढे ठेवते) ही घ्या पोथी न् करा काय वाटेल ते तिचं.
(भडाग्नि पोथी ताब्यात घेतो.)
स्वामी : अग्नीत जाळीन हो पोथी भस्मसात करा.
सर्व भट : भस्मसात – भस्मसात करावी (टाळ्या.)
गावबा : (हळूच) म्हादबा, बामन् काय म्हंगत्यात!
गिरजा : भस्मसात् करावी? सगळ्या दख्खन-दुनियेनं ज्याला आत्मसात् केलंय, त्याला तुम्ही काय भस्मसात् करणार!
म्हादबा : अक्षि टक्कुरंच श्येकलं जनु!
भडाग्नि : मला वाटतं खाली वर दगडाच्या लठ्ठ चिपा बांधून, या बाडाला भागीरथीतच जलसमाधी द्यावी.
सर्व भट : जलसमाधी द्यावी—जलसमाधी द्यावी.
गिरजा : देऊन पहा. तमाम भागवत भक्तांनी हृदयाच्या खोल तळाशी ज्याला ठाव दिलाय, त्याला कोणती भागिरथी आणखीन् बुडवणार? ज्ञानदेव जनार्दन स्वामींचा हा प्रसाद, स्वामीमहाराज, अलम् दुनियेची गंगा, हातावर झेलून मस्तकावर नाचवील बरं मस्तकावर!
म्हादबा : सनान् हानलिच अनु गोफनिची फ्याक्.
गिरजा : पोथ्या जाळल्या बुडवल्या, तरी पाठ न् संप्रदाय कधी बुडत नसतात.
भंपक : श्रीनी बायकांशी वाद करणं, प्रशस्त नाही.
गिरजा : का प्रशस्त नाही? आद्यशंकराचार्यांनी मण्डनमिश्राच्या सरस्वतीशी केला होता ना वाद?
चव्हाटे : अन् आचार्यांनी तिला पराभूतच केली ना अखेर?
गिरजा : मग करा ना मला पराभूत? बायकांवर दिग्विजय मिळवायची ही दुसरी संधी कशाला दवडता?
म्हादबा : श्येन भरलाच भडकावला जनु!
स्वामी : ओम शांतिः शांतिः शांतिः
गावबा : खामोष खामोष. गडबडम् न कुर्यात्. सावधान दे दान, सुटेSSगिराण.
स्वामी : एकनाथ तू अन् तुझी विदुषी पत्नी, जातीधर्मानं ब्राह्मण असून, एकीकडं मोठा धर्माभिमान दाखवता, अन् दुसरीकडं धर्मभ्रष्ट क्रियानष्ट चाण्डाळ अन्त्यजांना डोक्यावर घेऊन नाचता, जन्माच्या जातीशी विरोध करून, अन्त्यजांशी सलगी करता! सहकार्य करता!
एकनाथ : सहकार्यचसं काय, पण सहकुटुंब सहपरिवार सहभोजनहि करतो.
सर्व भट : धिःक्कार, धिःक्कार, धिःक्कार!
एकनाथ : ब्राह्मणजनाशी मी विरोधानं वागतो, हा शुद्ध गैरसमज आहे. स्वामीमहाराज, केवळ ब्राह्मणांच्याच नव्हे, तर अखिल हिंदुजनांच्या उद्धारासाठीच अस्पृश्यांना जवळ आणण्याची मी धडपड करीत आहे. आमच्या माणुसकीचा बदलौकिक टाळण्यासाठीच या अभागी अस्पृश्यांना माणुसकीनं वागवा असा मी सारखा टाहो फोडीत आहे. त्यांचा उद्धार तुम्ही आम्ही कोण करणार? तो करायला ते समर्थ आहेत.
भडाग्नि : मग त्यांच्याशी संगनमत करून पांढरपेशा समाजाविरुद्ध त्यांना तू का चिथावण्या देतोस?
एकनाथ : मानवी जिण्याचं कर्तव्य त्यांना मी शिकवीत असतो. चिथावण्या देत नसतो. तुम्ही गुलाम आहात, हे गुलामांना पटवून देणं, अन् शिरजोरांना त्यांच्या जुलमी शिरजोरीची लाज उत्पन्न करणं, हाच वास्तविक प्रत्येक धर्माचा मूळ उद्देश. तोच विचार मी उच्चाराप्रमाणं आचारात वठवीत असतो.
चव्हाटे : धर्माचा उद्देश तुमच्याकडून शिकण्याइतकी वैदिक संस्कृती म्हणजे कच्च्या मातीचं मडकं नव्हे!
भंपक : का कच्चं भाजलेलं थालिपीठ नव्हे!
भडाग्नि : तुझ्या साऱ्या खटपटी वर्तमान धर्मांचा उच्छेद करणाऱ्या आहेत.
एकनाथ : एवढं मात्र तुम्ही खरं बोललात. जो धर्म प्रेमाला पारखा झाला त्यात कसलं प्रेम उरलं? दयेचा थेंब शिल्लक नसलेल्या या धर्मकल्पनेचा न् तिनं समाजात फैलावलेल्या माणूसघाणीचा उच्छेद करणं हाच माझ्या जीविताचा एक छंद होऊन बसला आहे. स्वामीमहाराज---
(भैरवी : जोगी मत जा.)
लोकीं तिळ या हृदया न दया ।।
धर्म धरी अविवेका ।।धृ.।।
मोक्ष-वल्गना घुमविती गगना ।
मानवता नच मनुजा ।।१।।
धारण सुटले मारण सुचले ।
हाय! अधर्म-पसारा ।।२।।
दयाशून्य हा धर्म भारता ।
दास्य-पंकिं ने विलया ।।३।।
स्वामी : एकनाथ, ही तुझी आचार-विचार-सरणी महापातकी, - एतएव सनातन धर्माविरुद्ध बंड आहे.
एकनाथ : होय, बंड आहे. अन् त्या बंडाच्या वेडानं उभ्या दख्खनला मी वेड लावलं आहे. प्रचलित धर्मकल्पनांना मी जबरदस्त धक्का दिला. आज देत आहे, न् या कुडीत प्राण असेपर्यंत देत राहणार.
म्हादबा : (स्व.) येला म्हत्यात मनुक्षे! न्हाई तर हाईत – मायन्दाळं हाईत. जगत्यात् नि मरत्यात्!
एकनाथ : भागवत धर्मच दयेच्या ओलाव्यानं ब्राह्मणासकट अखिल हिंदुजनांचा उद्धार करील, असा माझा आत्मविश्वास आहे.
चव्हाटे : उद्धार करील! केला उद्धार. सगळ्या समाजाची घडी बिघडवली---
गावबा : दौलत्या परटाकडं धुवायला टाका---
म्हादबा : म्हजी, अक्षी कडाक इस्तारीत परात!
चव्हाटे : याच्या मराठी पुराणानी सारे ब्राह्मणेतर तर बिथरलेच, पण बटकीचे म्हारमांगसुद्धा गावकरीची कामं साफ नाकारू लागले. स्वामी महाराज, एकनाथाच्या या अधर्मी बण्डाळीमुळं, वैदिकधर्म तर साफ बुडालाच, पण पांढरपेशा रयतेला---
गावबा : म्हणजे भोजनभाऊ भटांना---
चव्हाटे : इभ्रतीनं जगण्याची सुद्धा पंचाईत पडली आहे.
भंपक : भिक्षुक म्हणजे तळलेला पापड त्यानं टिचकीनं फोडावा. आंगाचा कसा तिळपापड होतो.
चव्हाटे : नुकताच पैठणवर लाळीचा रोग आला. शेकडो ढोरं मेली. पण पडी उचलायला एकही म्हारडा आला नाही. अखेर आम्हाला ती महाराची कामं करावी लागली.
गावबा : बेचाळीस पूर्वज गतीला गेले. वाईट काय झालं त्यात? आपलं प्रेत आपणच जाळण्या पुरण्यात सोवळं टिकतं.
भडाग्नि : नावाचा एकोबा, पण महारमांगांना चिथावून यानं सगळ्या पैठणचा एकोपा बिघडवून टाकला.
एकनाथ : अक्षरशः कबूल. अभागी अस्पृश्यांच्या मनात मी त्यांच्या गुलामगिरीची खंति उत्पन्न केली. माणुसकीच्या हक्काची त्यांना जाणीव दिली, अन् भागवत धर्माच्या दिक्षेनं भिक्षुकी धर्माचा सैतानीपणा त्यांना पटवला.
स्वामी : एकनाथ, समाजात असंतोष भडकवणारी असली कृत्यं तुझ्यासारख्या विद्वान, नीतिवान न् जबाबदार माणसाला शोभत नाहीत.
एकनाथ : जबाबदारीची जाणीव ठेवूनच, स्वामी महाराज, हा विस्तवाचा खेळ मी खेळलो न् खेळणार. माझ्या मतानं मी ब्राह्मणाचं आद्यकर्तव्य बजावीत आहे. पण तुमच्या दयाशून्य धर्माच्या दृष्टीनं, मी जाणून बुजून भयंकर अपराध केला आहे. या महापातकाबद्दल अधिकात अधिक असेल ती शिक्षा स्वामींनी खुशाल द्यावी. ती भोगायला मी सहकुटुंब सहपरिवार आनंदानं तयार आहे.
स्वामी : (स्व.) याच्या आत्मबळापुढं आमची निर्णयशक्ती दिङ्मूढ होत आहे!
भडाग्नि : स्वामी महाराज, याला देहान्त प्रायश्चित्ताशिवाय दुसरं प्रायश्चित्त नाही.
एकनाथ : प्रायश्चित्त? प्रायश्चित्त पश्चात्त्पाला. मला पश्चात्तापच होत नाही, तर प्रायश्चित्ताचा प्रश्नच येतो कुठं? अस्पृश्योद्धार हा माझ्या जीविताचा पंचप्राण आहे, अन् तो एकनाथ नष्ट झाल्याशिवाय थांबणार नाही.
गिरजा : देहान्त शिभेच्या धमक्या देता कुणाला? अनाथ अपंगांच्या सेवेला ज्या दिवशी तनमनधन अर्पण झालं, त्याच दिवशी आमची या देहावरची सत्ता गेली. आमचे देह जाळून त्यांची राख केली, तरी त्या राखेचा कण न् कण, अस्पृश्योद्धाराच्या किंकाळ्या मारीत, उभ्या भरतखंडात धिंगाणा घातल्याशिवाय राहणार नाही.
एकनाथ : स्वामी महाराज, आपण धर्मज्ञ न् धर्मात्मे आहात. प्रचलित धर्माच्या स्नेहशून्य ताठरपणाची आपली जर खात्री पटली असेल, तर चला-उठा. भिक्षुकशाहीच्या या प्रतिनिधित्वाचा त्याग करा, अन् श्रीज्ञानदेव, नामदेवरायांच्या, अस्पृश्य संतशिरोमणी चोखोबारायांच्या भागवत धर्माचं भगवं निशाण हाती घ्या. हिंदु समाजाला माणुसकीचा धर्म शिकवा. गावोगावच्या असल्या मूठभर भटाभिक्षुकाऐवजी, उभा भरतखंड-महाराज-आपल्या पायावर लोळण घेऊन आपला जयजयकार करील.---हे पसंत नसेल, तर करा शिक्षेचा उच्चार. हा मी सहकुटुंब तयारच आहे.
स्वामी : (स्व.) याच्या अंतःकरणाच्या तळमळीनं आमच्या कोत्या धर्माभिमानाचा फोलपणा चांगलाच सिद्ध झाला.
गावबा : बुचकळ्यात पडू नका. देहान्त शिक्षा पार पाडायला समोरल्या मंडळींत मांगांची उणीव पडणार नाही.
स्वामी : शास्त्रीजनहो, विवेक-प्रामाण्य श्रेष्ठ, का ग्रंथ-प्रामाण्य श्रेष्ठ, हा प्रश्न प्रस्तुत वादात महत्त्वाचा आहे.
भडाग्नि : आम्ही ग्रंथप्रामाण्य श्रेष्ठ मानतो.
गावबा : मी भोजनप्रामाण्य श्रेष्ठ मानतो.
एकनाथ : धर्मग्रंथांच्या उलथापालथीपेक्षा, स्वामीमहाराज, तुमच्या आमच्या अंतःकरणाच्या उलथापालथीनंच या हीनदीन जिवांचा उद्धार होणार आहे. काळाबरोबर काळजाची ठेवण बदला न् विवेकाच्या उजेडानं चालू दिनिया पाहा. बापहो, या अडीच तीन कोट धर्मबांधवांना साध्या माणुसकीनं वागवायची आम्हाला अक्कल नसेल, तर आमच्या मोक्षाच्या वल्गनांवर सैतानसुद्धा विश्वास ठेवणार नाही.
स्वामी : ही गोष्ट आम्हालाही पटते. प्रस्तु वादाला आम्ही तडजोड सुचवितो.
गावबा : (स्व.) आँ! जोडाजोडीवरून तडजोडीवर आले. (उ.) म्हादबा, बामनं काय म्हनत्यात?
म्हादबा : (हळूच) म्हनत्यात बिरामदेवाचं टक्कुरं!
स्वामी : ब्राह्मण ग्रंथप्रामाण्य मानतात. अन्त्यजोद्धार ग्रंथप्रामाण्याशी विसंगत आहे. तेव्हा पैठणला भडकलेला सामाजिक असंतोष तात्पुरता शमविण्यासाठी, अन्त्यजोद्धाराचा त्याग करायला, एकनाथ, तू तयार आहेस का?
एकनाथ : प्राणान्तीही नाही.
गिरजा : गळा कापला तरी त्या गोरगरिबांशी आम्ही बेमान होणार नाही.
[विठू आणि म्हादबा सद्गदित होऊन एकनाथ गिरजेच्या पायावर ‘‘पुण्डलीक वरदे हारी विठ्ठल! जनार्दन एकनाथ’’ म्हणत डोके ठेवून आपापल्या जागावर येतात.]
एकनाथ : इतकंच काय, पण अस्पृश्यता-विध्वंसनासाठी ब्राह्मण्यविध्वंसन करायलासुद्धा माझी तयारी आहे.
भंपक : ब्राह्मण्य गेलं, मग राहिलं तरी काय?
एकनाथ : हिन्दुत्व! जबरदस्त संघटित हिंदुत्व. त्याच्या टिकावासाठीच अस्पृश्यांना आम्ही जवळ केलं पाहिजे. फार काय, पण हिन्दजुत्वासाठी, वेळ पडली तर, ब्राह्मण्याचा बिनशर्त बळी देईल, ‘‘खरा ब्राह्मण’’ म्हणून सारं जग त्याच्या माणुसकीची गीता गाईल.
भंपक : चांडाळ अन्त्यजासाठी ब्राह्मणाची होळी? वाहवारे अस्पृश्य न् धन्य त्यांचा उद्धार! (सर्व बिकट हास्य करतात.)
स्वामी : ओम शांतिः शांतिः शांतिः! (ब्राह्मणांना) असलं विकट हास्य तुम्हाला शोभत नाही. आज तुम्ही त्या हीनदीन अस्पृश्यांची हासून टवाळी करीत आहात पण त्यांच्या हृदयात पेटलेल्या असंतोषाच्या ठिणगीकडे दुर्लक्ष करू नका.
तिघं : ठिणगीच ना? आग नाही ना अजून लागली?
गावबा : आग लावण्याचा मान तुमचा. तुम्ही लावाल तर लागेल आग.
एकनाथ : ती ठिणगी विझवण्याचा आत्ताच यत्न झाला नाही, तर तिच्या प्रचंड होळीत, ते गुलाम न् आपण शिरजोर, दोघेही जळू खाक होऊ.
भडाग्नि : आग तर भडकू द्या. मग जगतो कोण न् जळतो कोण, पाहून घेऊ.
[आतून ‘‘आग आगा – धावा-धावा-म्हारवाड्याला आग लागली’’ असा ओरडा होतो. सर्व घाबरून आगीच्या दिशेकडे पाहू लागतात. गावबा म्हादबाला घेऊन धावत जातो. आपल्याकडे कोणाच लक्ष नाही असे पाहून, भंपकरावप्रभृती एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात.]
एकनाथ : परमेश्वरा, काय हा आकान्त! विठोबा धाव. (एकनाथ, गिरजा, विठोबा धावत जातात.)
स्वामी : (आसनावरून उठून पुढे येतात.) आमच्या आगमनप्रसंगीच हा अग्निप्रलय व्हावा! नितान्त दुर्भाग्य! कशानं ही आग लागली?
भंपक : परमेश्वराला अधर्म तिळमात्र खपायचा नाही. अन्त्यज आपला पायरी सोडून अधर्मानं वागतात. म्हणून अग्नीदेवाचा प्रकोप असाच नेहमी होत असतो.
स्वामी : बंद करा मूर्खांनो तुम्ही ही पाखण्डी बडबड, स्नेहशून्य धर्माचरणानं तुम्ही किती पाषाणहृदयी झाला आहात, हेच तुम्ही या पैठणात मला दाखवलंत, शिव शिव! एखाद्या क्षेत्रालाही लाजवील असा हा सुंदर विठ्ठलवाडा भस्मसात व्हावा!
[सर्वांग भाजलेल्या सीतेला गावबा व म्हादबा हातावर उचलून आणतात. मागोमाग गिरजा, हिरकणी, एकनाथ व विठू येतात. गिरजा सीतेला मांडीवर घेऊन बसते.]
म्हादबा : अरारारारारारा! परमेसरा, काय या देवीपरमान बयेची दशा केलीस! कशी बिजली परमान् समद्या इण्टल वाड्यामन्दी चमकत व्हती रSS देवा. समद्या आयाबायांना न् कच्या बच्यांना मावलीन् ध-धरून भाईर काढलं. त्या चांगनाकाची आवा दिड म्हयन्याची बाळातीण, आगीत आडाकली. तिला न् तिच्या न्हानुल्या बचड्याला वाचवायला, बया कशी वाघिनीवानी डोम्बाळ्यात धावली! बाळ बाळातीणं भाईर काढली न् माझी सोन्यासारखी बया आगीत घावली!
गिरजा : आमच्या दुस्मनांना म्हणावं, घ्या आपल्या डोळ्यांचं पारणं चांगलं फेडून!
भंपक : म्हणजे? आम्ही का आग लावली, गिरजाबाई?
गावबा : खाई त्याला खवखवे. देवळात देवी अन् गावभर नायटे. कळतं आम्हाला सगळं!
एकनाथ : गावबा-म्हादबा, धावत जाऊन शहरातनं वैद्य शास्त्रीबुवांना घेऊन ये.
गावबा : त्यांच्या पायावर मी लोळण घेतली. ते येत नाहीत म्हणातत. म्हारमांगड्यासाठी नाही मी वैद्य बनलो.
सीता : (कण्हत बेसावधपणे) हं! चला-चला. बाहेर पडा-इकडं इकडं ये बाळ-घाबरू नकोस-अरे मीच तुझी आई! पेटली. ती पण झोपडी पेटली.
गिरजा : बाळ-बाळ, अशी काय बरं बडबड करावी! मी तुला माझ्या मांडीवर घेतली आहे ना?
सीता : माई-माई, आपला विठ्ठलवाडा वाचला का? सगळे भाईबंद बाहेर पडले का?
गिरजा : सगळे पडले बरं, तूच नाही का त्यांना जीवदान दिलंस बये!
सीता : विठ्ठलवाडा-सरदारांचा लाडका विठ्ठलवाडा
एकनाथ : पोरी, कशाला हळहळतेस त्या जळत्या वाड्यासाठी, म्हारवाडा ही कायमचीच जळती आग. तुझ्यासारख्या शेकडो जिवांचा बळी घेऊन, अखेर ती हिन्दु समाजाचीही राखरांगोळी करणार!
सीता : मामाजी-सरदार-माई, पाणी पाSणी
गिरजा : पाणी-पाणी-गावबा-पाणी
[गावबा पाणी आणायला जातो.]
विठू : …..(सीतेजवळ जाऊन) लाडक्या जिवा. या फत्तराच्या दुनियेत तुझ्या तोंडात घालायला कुठचं पाणी मिळणार! या हतभागी विठ्याच्या डोळ्यातनं कोसळणारी ही गंगामाई- (डोळे निपटून ते पाणी सीतेच्या तोंडात घालतो.) पी माझ्या जिवा पी!
सीता : आहा! माझा आत्मा थंड झाला! [एकदम झटक्याने अर्धवट उठून] ते पहा, ते पहा-माझे शिलेदार आले. घोड्यावर बसून आले, --येऊ? मी येऊ? आले हो आले.---राSम! (पडते व मरते.)
गिरजा : अगबाई! हे कसं काय झालं! पहा हो-पहा हो!
एकनाथ : देवाचं देणं देवाघरी गेलं!
गिरजा : सीता-सीता, हिरकणी, गेली आपली सीता!
हिरकणी : माझी गुरुमावली. अनाथ अपंगांची सावली, सगळ्यांना चटक लावली न् बिजली चमकून गेली.
[गावबा पाणी घेऊन येतो. पण सर्व प्रकार पाहताच पाण्याचे भांडे त्याच्या हातून गळून पडते.]
विठू : हिराबाय, गिरजाबाय, तुम्ही रडता? ही रडण्याची वेळ?
गिरजा : विठूबाबा, तुमच्या घराण्याची होळी झाली हो होळी!
विठू : तशी सगळ्या विठ्ठलवाड्याची झाली. बये, समाजाच्या उद्धारासाठी संसाराच्या न् घराण्याच्या होळ्या अशाच पेटवाव्या लागतात. हे तुम्ही मायबापानीच नाही का आम्हाला शिकवलं? आजर तर आपण सगळ्यांनी दिवाळी साजरी करून, देवाघरी गेलेल्या या देवमाणसाचा नको का उत्सव करायला? पहा, पहा, माझ्या पोरीचा चेहरा पहा. कसा फुललेल्या गुलाबासारखा हासतमुख आहे तो! पापी माणसं मृत्यूच्या नुसत्या कल्पनेनंच भेदरतात. पण असली देवमाणसं हासत हासत मरणाला मिठी मारतात. देशधर्म देवासाठी, माझ्या रामजी शिलेदारानं समरांगणावर पंचप्राण वाहिले. आज माझ्या या जिवाच्या विसाव्यानं, आगीच्या डोम्बाळ्यात सापडलेल्या शेकडो जिवांच्या बचावासठी, आपल्या जिवाचं सोनं केलं. माझा वेसकर घराण्याचा उद्धार झाला. बाप हो, असल्या आत्मयज्ञानंच जनात-जनार्दनाच्या हृदयात माणुसकीची गंगा भागिरथी प्रगट होईल, अन् आम्ही अभागी अस्पृश्यांना मायेच्या थंडगार पाटानी भिजवून चिंब करील.
स्वामी : (उद्वेगाने) धिःकार धिःकार आमच्या ब्रह्मज्ञानाला न् ब्राह्मण्याच्या अंहकाराला!
सर्व भट : हे काय? हे काय?
स्वामी : गप्प बसा मूर्खांनो.
एकनाथ : स्वामी महाराज,
स्वामी : एकनाथ, तुझ्या विवंचनेची तिडीक आम्हाला पटली. या हृदयविदारक दृश्यानं आमच्या आचारविचारांत क्रांती झाली. अस्पृश्यता हिन्दुधर्माचं महापाप आहे. आमच्या भवितव्यावरचं सनातन गण्डान्तर आहे. (उठून विठूजवळ येतात.) आSSहा विठोबा, जातीनं तू महार, तुला अन्त्यज म्हणणारांच्या जिभा झडल्या पाहिजेत. तुझी ही स्वार्थत्यागी, सत्त्वशील न् धीरगंभीर वृत्ती पाहून ‘‘तूच खरा ब्राह्मण-तूच खरा ब्राह्मण’ म्हणून तुला अस्सा (मिठी मारतो.) हृदयाशी कवटाळण्यातच आमच्या धर्माची माणुसकी सिद्ध होणार आहे.’!
सर्व जण : तथास्तु तथास्तु तथास्तु.
‘‘खरा ब्राह्मण’’ नाटिका समाप्त
जनता जनार्दनार्पणमस्तु
नवीन पुरवणी प्रवेश
हेतू : खरा ब्राह्मण नाटिकेचे प्रयोग करणाऱ्या अनेक हौशी नाट्यसंघांना नर्तकी हिरकणीच्या पात्राची मोठी अडचण भासते. प्रवेश गाळावा तर पंचाईत, न गाळावा तरीही पंचाईत. डेक्कन पार्कस् नाट्यसंस्था चालविताना माझ्यापुढे हीच अडचण पडली होती. तेव्हा मी एक नवीनच प्रवेश लिहिला नि रंगभूमीवर दाखवला. तोच या पुरवणीत मुद्दाम छापीत आहे. त्याचा पुष्कळ नाट्यसंघांना चांगला उपयोग होईल, अशी माझी खात्री आहे.
- के. सी. ठाकरे
अंक २ रा ---- प्रवेश २ रा [हिरकणीच्या प्रवेशाऐवजी]
स्थळ : एकनाथाच्या घराची ओसरी.
[स्थिती : पठाचा वेष घेतलेला गावबा एक बाजून येतो नि दुसऱ्या बाजून जातो. पाठोपाठ त्याच्याकडे पाहत गिरजा प्रवेश करते.]
गिरजा : हा काय मेला चमत्कार? कोण रे तो. होतोस का नाही बाहेर, का श्रीखंड्याकडून घालू खेटर मारून बाहेर. पैठण क्षेत्राचं अझून काही हिंदुस्थान नाही झालं. श्रीखंड्या-अरे गावबा, मारा रे याला मोजून दहा धक्के नि न्या पकडून तिकडच्या समोर म्हंडे दाखवतील उर्मटाला दौलताबादचा तुरुंग, श्रीखंड्या -
गावबा : [प्र. क.] श्रीखंड्या पानी भरता है मायजी. मैं गावबाखान हूं. तशरीफ उठनेके लिय बन्दा एक छोडके दो पावर खडा है, आलेकम सलाम.
गिरजा : काय चमत्कार तरी! गावबा, दिसंदीस तू फारच आचरटपणा करू लागलास.
गावबा : आचरटपणा हा सध्याच्या युगाचा महिमा आहे. मायजी. त्याशिवाय उगाच का हलकेसलके गावगुण्ड देवकळा पावतात नि रंकाच राव होतात? मला पुरुषोत्तम व्हायचं आहे ज्ञानदेव नामदेवावर ताण करायची आहे.
गिरजा : आस्सं! मुसलमान बनून का तू पुरुषोत्तम होणार?
गावबा : मी कुठं मुसलमान बनलोय? भलतेसलते आरोप नका करू बुवा.
गिरजा : तुला आता मुसलमान नाही म्हणायचं तर काय हिंदू?
गावबा : पेहराव बदलला का धर्म बदलता, तर आपल्या विठू वेसकराला मराठे मंडळींनी मराठा मानून, शुद्ध करून, केव्हाच पंक्तिपावन केला असता. राजकर्त्यांचा राजमान्य पेहराव पांघरला म्हणजे काय चमत्कार होतो, माहीत आहे?--नाही?—चालू जमान्यात थोड्याशा बदलान---पगडीपालटानं-चारचौघात मानमान्यता मिळते. नाक्यावरले—चावडीवरले शिपायी मुजरे करतात. अडाणी लोक टरकून दूर होतात. शेकडो नंदी महादेवाच्या गाभाऱ्यावर देवकळा पावतात. असे किती तरी फायदे होतात.
गिरजा : हां, अन् उचल्या भामट्यांना राजरोस खिसे कापता येतात-दात काय काढतोस? तिकडून तुला असं पहाणं झालं, तर काय म्हणतील.
गावबा : का-ही म्हणायचे नाहीत. बाहेरच्या रंगाढंगावरून अंतर्यामाची किंमत करणारी कोती कावळी दृष्टी स्वामींना असती, तर, मायजी, संत म्हणून एकनाथजींचा डंका काशी ते रामेश्वर झडलाच नसता.
गिरजा : अरे, पण आमच्या थेट घरात मुसलमान वावरताना पाहून लोक काय म्हणतील?
गावबा : लोक काय म्हणतील! गिरजाबाई, फुकट फुकट स्वामींच्या अर्धांगी झालात! अझून तुम्ही लोकमताला भिताच आं? आमच्या लोकांना खरोखरच काही मत असतं, तर अस्पृश्यतेसारखी बेमाणुसकीची रक्तपिती हिंदुसमाजाला लागलीच असती कशाला? हा महारोग समूळ नाहीसा करण्यासाठी, एकनाथजींनी हातात वीरकंकण बांधलं, ते काय या पिसाट लोकमताची पर्वा करूनच वाटतं?
गिरजा : ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेनं रेडा जसा वेद बोलू लागला -
गावबा : तसा मात्र हा गाढव जुन्या वेदांची रकटी चघळणार नाही हां, ख्याल रखो. माझा खाक्या थरकत घोडा भडकत निशाण. नित्य नवे गावबाला हवे. काल आपल्या घरी श्राद्धाच्या ब्राह्मण भोजनाऐवजी, म्हार-मांगादि अस्पृश्यांना मुक्तेद्वार सुग्रास भोजन घातलं, तुम्ही स्वतः त्यांना पंक्तीत वाढलं-आग्रह केला. त्या बिचाऱ्यांना केवढा बरं आनंद वाटला! एकनाथजींच्या डोळ्यातसुद्धा ब्रह्मानंदाच्या हिरकण्या-कशा चमकू लागल्या-पाहिल्यात ना? रेड्यामुखे वेद बोलाविणाऱ्या ज्ञानोबानीसुद्धा असल्या आनंदाचा हेवा करावा. मग तुम्हीच सांगा. अस्पृश्यांच्या पंक्तीला, जोडीला जोड म्हणून,एकादा वकठलेण्डमुण्डखान किंवा गावबाखान मांडी ठोकून बसला असता, तर काय तुम्ही श्रीखंड्याकडून त्याला गचांड्या दिल्या असत्या?
गिरजा : मुळीच नाही. सर्वांभूती सम, वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ.
(लांबून ‘‘धाव धावा, कुणीतरी धावा’’ अशी सीतेची किंकाळी ऐकू येते.)
गिरजा : अगबाई! कुणाची ही किंकाळी? काहीतरी दगा दिसतो. गावबा धाव धाव.
गावबा : पाहून घ्या आता या गावबाखानाचा तडाखा. माझा होरा चुकायचा नाही.
गिरजा : सीतेचीच किंकाळी ही. (दोघे लगबगीनं जातात.)
(दुलीचंद मारवाडी नि भंपकराव भोजने येतात.)
मारवाडी : साला येची घरामंदी मिसिलमान बी रेते?
भंपक : सगळा भ्रष्टाचार मांडलाय रांडलेकानं! काल सगळ्या महार-मांग-धेडाना श्राद्धाचं भोजन घातलं, नि पितर म्हणून हा एकनाथ त्यांच्या पाया पडला.
मारवाडी : अने ते धेडलोगला दिच्छिना बी दिली? अगे बालाजी, बंकटजी, गनछोडगायजी, ए तग धगमला डुबवते साला.
भंपक : पाहून घ्या. स्वतःच्या डोळ्यांनी पाहून घ्या. खात्री करून घ्या. आम्हाला सगळ्यांनी ठरवलंच आहे म्हणा कानफाटे. तशात आम्ही तुम्हाला चिथावलं, असा नसता आरोप नको बुवा आम्हा गरिबांच्या माथ्यावर, पैठण म्हणजे दक्षिणेतली काशी--
मारवाडी : तिला ए हिकनाथ देते फांसी.
भंपक : अशा पवित्र क्षेत्रात असा भ्रष्टाचार होऊ लागला तर सारी दुनिया आमच्या तुमच्या तोंडात—काय हवे ते घालील.
मारवाडी : घालेल घालेल – मूमंदी शेन घालेल.
भंपक : तर मग या बाटग्याला पैठणातनं नको का उखडन टाकायला? विचार करा, तुम्ही तर आमचे पुढारी-नगरशेट-सारा व्यापार तुमच्य हातीं. धर्माचे तुम्ही कट्टे कैवारी. तुम्हीच मनावर घेतलं नाहीत, तर आम्ही पळीपंचपात्रवाले काय हो करणार? कलियुग् म्हणून पोटाची दामटी चोळीत बसणार!
मारवाडी : असे ईसा कसाला घाबरते. तुमी शानालोक काय आमाला खोत्ता सांगते, ए हिकनाथजीणे सम्दा बॉतेगिगीचा बेपाग चालवूनशी हिंदु धगमला ऑग लावली ऑग.
भंपक : लावली ना? पाहिलीत ना?
मारवाडी : हामसा तो दोका भडकला!
भंपक : हां! धर्म भडकला, तरी डोकं भडकू देऊ नका. शीर सलामत तर धर्म पचास. डोक्याचा धर्मच धर्माचं डोकं वाचवील.
मारवाडी : धगम गेला मंजी काय राला?तमे न हमे? शेटजी ने भटजी?
भंपक : ही जोडगोळी हवा तो धर्म पैदा करील. पण टिकली पाहिजे कशी? अश्शी! अगदी कडीत कडी. बोला. पैठणची अब्रू वाचवता, का हा भ्रष्टाचार मेल्या मुदर्यासारखा उघड्या डोळ्यांनी पाहता?
मारवाडी : कसाला पाहेल – कसाला पाहेल. साला ए हिकणाथजीला उखडून टाकेल.
भंपक : मग काढा तुमचं उघराणीचं शस्त्र बाहेर नि आणि रांडलेकाची हंडी-मडकी चव्हाट्यावर.
मारवाडी : ए भंपकराव, असा नको तू बोल. तेनी तग आमचा सम्दा पीसा कवाच देऊनशी टाकला.
भंपक : अहो पण अजून तुम्ही पावती कुठं दिली आहेत? पावतीशिवाय पैशाची फेड कायद्यानं होत नाही.
मारवाडी : अगे ते इठू नि गावबा हामसी छातीवग बसला मजी कॉयदा बॉयदा सम्दा—
(आत गावबा ओरडतो -- ‘‘जोड्याखाली फटकावतो हरामखोराला’’)
मारवाडी : अरे भागो भागो---ते गावबाच हिकडशी आला. बालाजी बंकटजी.
(भंपकराव नि मारवाडी पळून जाता. सीतेसह गिरजा प्र.क.)
गिरजा : आमच्या बगिच्यात येऊन असला हलकटपणा करायला या मेल्याला लाज कशी वाटली नाही. तुला काही दुखापत तर झाली नाही ना सीताबाई. चांडाळ मेले गावगुंड! तुझ्या अंगावर हात टाकण्याइतका हा केऱ्या कळसुत्र्या पाजी असंल, असं नव्हतं बाई मला वाटलं. मेले देवाचे बडवे म्हणवतात---
(गावबा केरोबाला कान पकडून खेचीत आणतो. तो ओरडत असतो.)
गावबा : अन् गावाचे शेतखाने उपसतात. काय बडवे महाशय, देवाच्या काकड आरतीची वेळ नि इकडं कुठं क्कल पाजळायला चुकलात. चोरांनो, पुजारी म्हणून मिरवता, अस्पृश्यांना अन्नदान केलं म्हणून एकनाथजीला महार म्हणता. त्यांना वाळीत टाकण्याच्या खटपटी करता. गंगेच्या घाटावर मुसलमान गुंडाला चिथावून त्यांच्या अंगावर थुंकायला लावता. अन् इकडं गोरगरीब पाक पोरीच्या अब्रूवर धाड घालता.
केरोबा : गावबा, कान सोड म्हंजे करतो सगळा खुलासा.
गावबा : आधी आठवली अवदसा नि आता करतोय खुलासा.
गिरजा : आमच्या बागेत एकटी गाठून, सीतेसारख्या अनाथ अश्राप पोरीवर हात टाकलास? मेल्या तू माणूस का पशू?
गावबा : सीताबाई, बोल या बडव्याची हाडं उभी चिरू का आडवी ठेचू?
सीता : गावबा, त्याला सोडून दे.
गावबा : सोडून दे? सोडून देण्यासाठी का या देवळी गाढवाला पकडलं? तुझ्या शीलावर यांनी हल्ला करावा---
सीता : हल्ला? अरे, शीलावर हल्ला कराया कुणाची माय व्यालीय गावबा? ही सीता म्हंजे पांढरपेशांच्या परसातलं लाजाळूचं झाड, का दावणीची गाय समजतोस? म्हारवाड्यातल्या विठू वेसकराची सून आहे म्हटलं मी सून! लढाईत मर्दाच्या मरणानं मरून, देवाघरी गेलेल्या रामजी शिलेदाराची रण्डकी शिलेदारीण आहे मी शिलेदारीण. बागेत तुळशी तोडताना, गैरसावध पाहून यांनी माझ्या अंगावर हातटाकला, पण-त्यापुढं मजल जाती तर- (निरीतून कट्यार काढते.) पाहिलीस? पाहिलीस?—पाहिलीस ही?--- त्यावर माझ्या शिलेदाराचं नाव कोरून, नगराहून या रण्डकीला आंदण आलीय आंदण. (कट्यार कपाळाला लावून वंदन करते.) या महालक्ष्मीनं या रेड्याच्या काळजाचा ठावच पाहिला असता.
गिरजा : अहो ब्रह्मदेव….भूदेव……पाहिलीस ना कशी आहे सीता? आहे ना जागती ज्योत भगवद्गीता?
गावबा : अहो, याच्या कंबाटात पाहिजेत लाथा. गाढवापुढं कशाला गीता.
सीता : राजे महाराजांच्या महाराण्यांवर बलात्कार होतील. पण महारणीवर हात टाकणाऱ्यांच्या घरातले कुंकवाचे करंडे पालथे पडतील.
गावबा : (ऐकलं का भूदेव? का करू कानाची भोकं साफ?
सीता : माझी किंकाळी ऐकून, मायजी चटकन धावल्या नसत्या, तर गावबा, माझी एक गरीब बहीण आज फुकट रंडकी होती बरं! दे त्याला सोडून, पाप्यावर आपण नेहमी दयाच केली पाहिजे.
गावबा : दया केल्याचं दुःख नाही, पण बडवा सोकावतो त्याची वाट काय?
केरोबा : (किंचाळत) त्याची वाट ता तडक घराकडं……घराकडं…….घराकडं!
गावबा : घर तर आहेच हो. पण आज देवाच्या काकड आरतीला धाब्यावर बसवलीत. आनंदी बाजाराच्या माडीवरच्या सैंयामैंया जलशाला टाकून इकडं वडलांच्या श्राद्धाला धावलात. आता इथंच थोडी संगीत आरती नि डफावरची लावणी होऊन जाऊ द्या बुवा. थोबाडाच डफ नि कानाचं तुणतुणं मी अस्सं सुरात लावून बदडतो. का गंधर्व तुंबरूंनी क्षीरसागरात जलसमाधीच घेतली पाहिजे---गिरजाबाई, ऐका सीता, तू पण नीट ऐक---या तंबोऱ्याच्या खुंट्या पिरगाळून भैरवरागाचा पहा कसा मी उद्धार करतो तो. (जोराने कान पिरगाळतो. केरोबा ओरडतो.) टँव टँव् टँव्---अझून झार नाही लागत नीटशी. भोपळा फोडून षड्ज ताणला पाहिजे. (केरोबा ‘‘कान सोड, कान सोड, मेलो!’’ असे ओरडतो.) अरेच्चा जव्हारी बिघडली वाटतं. सीता, तुझं ते नालबंद खेटर कुठं आहे. खेटरानं नाकबोंडीची जव्हारी चांगली घुसून दुरुस्त केली पाहिजे. (केरोबा मोठमोठ्याने ओरडतो.) हां. याला म्हणतात दरबारी कानडा. का, लागला की नाही तंबोरा भरघोस सुरात.
सीता : जाऊ दे रे गावबा. सोड त्याला. असल्या भल्या माणसाची अवहेलना करणं चांगलं का.
गिरजा, सीता : सोड त्याला, सोड!
गावबा : (जशी तुमची मर्जी. ए मानवाच्या कारट्या, जा. देवळात घंटा बडवून, रोज अडाण्यांचा उद्धार करतोस. आज एकनाथजींच्या ओसरीवर एका महारणीनं तुला मोक्ष दिला. चले जाव! का दाखवू थरकत घोडा भडकत निशाण.
(केरोबाला गावबा रट्ट लगावून हाकलतो. तो ओरडत बाहेर जात असतानाच कनाथ येतो.)
एकनाथ : गावबा, गावबा, काय हा अत्याचार.
केरोबा : (एकनाथाच्या पायावर पडतो.) नाही महाराज, अत्याचारी मी, मी पापी. आता डोळे उघडले. मला क्षमा करा. बस्स झाला हा भिक्षुकी पुजाऱ्याचा पेशा, हा संसार नको. काही नको.
एकनाथ : केरोबा, उठा. पश्चात्ताप हीच शुद्धी.
पद : राग पराज (दत्तगुरू. दत्तगुरू)
जाळ संसार हा टाळ घेऊनि करीं ।
चाळ पदिं बांधुनी । माळ गळि घाल ही ।।धृ.।।
चाळ जाळील तव पापराशी अखिल ।
टाळ हा संचिता लावि टाळा ।
माळ ही माणसा शिकवि माणूसकी ।
भागवत धर्म हा ज्ञानदेवे दिला ।।१।।
अंक २रा समाप्त
अंक १ रा ---- प्रवेश १ ला
(हातात चिपळ्या, एक लहानसे निशाण घेऊन, सीता भजन गात येते.)
पद.
असा कसा देवाचा देव बाई ठकडा ।
देव एका पायानें लंगडा ।।धृ.।।
गवळ्या घरिं जातो । दहिदुध खातो ।
करि दह्यादुधाचा रबडा ।।१।।
शिंकेच तोडतो । मडकेच फोडतो ।
पाडि लोणि ताकाचा सडा ।।२।।
वाळवण्टिं जातो । कीर्तन करतो ।
घेतो साधुसन्तांशी झगडा ।।३।।
(स्व.) विठ्ठला-पांडुरंगा, पैठणवर कसला आकांत गुजरलाय, नि देवा! तू डोळे मिटून स्वस्थ का बसला आहेस! काय आम्ही असं पाप केलं. का देवा, आमची गुरंढोरं लाळीच्या रोगानं धडाधड मरावी, गुरांढोरांवर सारी शेती, शेतीवर तुझे भक्तजन जगायचे. त्या गुरांचाच संहार झाल्यावर, देवा, आम्ही गरिबांनी कुणाच्या तोंडाकडं पाहायचं बरं. विठाई माउली दयेची भीक वाढ बये…दयेची भीक वाढ…
एका जनार्दनी भिक्षा वाढा बाई ।
देव एकनाथाचा बचडा ।।४।।
विठू : (प्र. क.) माझ्या लंगड्या भगवंताच्या प्रेमासाठी, विषाचा पेला हासत हासत पिणारी साध्वी मीरादेवीच आली की काय, असा मला भास झाला. मुली, तुझ्यातरी हाकेला पंढरीनाथ धावतो का?
सीता : मामाजी, माणसानं देवाची प्रार्थना करावी. पण संकटाचा भडिमार त्याच्यावर टाकून, स्वतः भक्तानंच देवाच्या नावानं संकटांना तोंड देऊन त्यांचा फडशा पाडला पाहिजे. भक्त नि देव निराळे नाहीत.
विठू : मुली, मला हे सगळं समजतं. पण ढोरांची पडी उचलायला आपला एकही जातभाई घराबाहेर पडत नाही. पांढरपेशांविरूद्ध त्याच्या मनात भयंकर तेढ पडली आहे.
सीता : पडली असेल. पण आपला विवेक तर चांगला जागा आहे ना. भक्तासाठी देवानंसुद्धा हवी ती बरीवाईट कामं नाहीत का? पंढरीरायानं कबिराचे शेले विणले. सावता माळ्याच्या मळ्यात राबला. सजन कसायाच्या दुकानात देवानं मासाच्या घड्या रचल्या, नि आपल्या संत शिरोमणी चोखोबारायांच्या बरोबर भगवंतानं मेलेली ढोरंसुद्धा ओढली. मग आपल्या गावातली पड्यांची परवड निपटायला, मामाजी, आपल्याला हो कसली लाज नि शरम [दूर पाहून] ते पहा—ते पहा. स्वतः एकनाथ महाराज पडी उचलायला धावले. तो पहा श्रीखंड्या आहे बरोबर, गावबा पण आहे, आणि तो केरोबासुद्धा लागाल त्यांच्या मदतीला, मामाजी, पाहता काय चला धावा. आपण भागवतधर्मी काय नुसते टाळकुटे. जगाच्या सुखासाठी हव्या त्या संकटाच्या खायींत धडाड उडी घेईल, तोच खरा भागवत. चला बोला, पुंडलीक वरदा हाSरि विठ्ठल.
(दोघे गर्जना करीत जातात.)
पद्यांची पुरवणी
(१) पान ३०१. ‘धरणं धरायला सोडला काय?’ या वाक्याच्या पुढे
गावबा :
राग---मुलतानी. चाल : सार्थचि ते वदती.
कलिमय हा झाला । पसारा ।।
मानवतेला कुठे न थारा ।।धृ.।।
दर्जनांस त्या वैभव आलें ।
सुजनीं जीवन कठोर झालें ।
नय नीतीचे नियम विराले ।।
मानवासि धरि मानव वैरा।।।।
(२) पान ३२५. ‘विटेवर थैथै नाचला असेल’ या वाक्याच्या पुढे
एकनाथ :
चाल : सबसे रामभजन करलेना.
श्रीरंग दिव्य हें बघुनी नाचे अलोट आनंदें ।।धृ.।।
प्रतिकाराची शक्ती तामस सत्वगुणी आवंरतां ।
मी-तुं-पणाचा निरास झाला भूषण हें भागवतां ।।१।।
क्रोध पळाला भेद निमाले वृत्ती हरिमय झाली ।
देहिं विदेही मिळे समाधी समता-पर्वणी आली ।।२।।
(२) पान ३२५. ‘विटेवर थैथै नाचला असेल’ या वाक्याच्या पुढे
गावबा :
चाल : रजनिनाथ हा नभीं.
बिकट पाश हा गुरुवरि पडला ।
गिळू पाहतो राहू रविला ।।धृ.।।
शास्त्र-चिकित्सा वर देखावा ।
अंतरिं विषसम कपटी कावा ।
जनार्दनी जनतेचा धावा ।
दे जय जय दे भागवताला ।।१।।
रजनिनाथ हा नभीं
बाळा जो जो रे । कुळभूषणा । दशरथ-नंदना । निद्रा करिं बाळा ।
मनमोहना । रामा लक्ष्मणा । बाळा जो जो रे [१]
ध्याती मुनि योगी तुजलागी । कौसल्या वोसंगी ।। बाळा. [२]
वेदशास्त्रांची मति जाण । स्वरुपीं झाली लीन ।। बाळा. [३]
चारी मुक्तींचा विचार । चरणीं पाहति थोर ।। बाळा. [४]
राम रावाचा भुकेला । भक्ता आधिन झाला ।। बाळा. [५]