काळाचा काळ
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
काळाचा काळ
ऐतिहासिक गद्य नाटक
प्रबोधनकार ठाकरे
प्रथम प्रकाशन
प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्मय – खंड तिसरा
१९९९
प्रकाशक
सचिव,
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,
मुंबई ४०००२५
मुद्रक
व्यवस्थापक,
शासकीय फोटझिंको मुद्रणालय,
पुणे - ४११००१
अंक पहिला.
(स्थळ, स्थिती नि पात्रे : चितोड किल्ल्यातील श्री एकलिंगेश्वराचे देवालय. पूजा आटोपल्यावर पुजारी आणि इतर लोक आरती करताहेत.)
जटा भुजंग पिंगलत् स्फुरत्फणा मणिप्रभा
कदम्ब कुंकुमद्रव प्रदिप्त दिग्वधूमुसे
मदान्ध सिन्धुरस्फुरत् त्वगुत्तरीय मेदुरे
मनोविनोदमद् मुतम् विमर्तु भूत भर्तरी
अगर्व सर्व मंगला कलाकदम्ब मंजरी
रसप्रवाहमाधुरी विजृम्भणा मधुव्रतम्
स्मरांतकम् पुरांतकम् भवान्तकम् कृतान्तकम्
गजान्त कान्त कान्तकम् तमान्तकान्तकम् भजे
जयत्वदम्र विभ्रम भ्रमद् भुजंग मत्स्फुरत्
धगत् धगत् विनिर्भ्रमत् कराल काल हव्यवाक्
घिमित् धिमित् घिमित् ध्वनन् मृदंग तुंग मंगलत्
ध्वनिक्रम प्रवर्तित प्रचण्ड ताण्डवः शिवः
(आरती पुरी होत असतानाच सरदार जयपाळ दर्शनाला येतो. एक भटजी घाईने पुढे होऊन त्याला आरती दाखवतो. जयपाळ आरतीत मोहोर टाकतो. भटजी आशीर्वाद गुणगुणतो. चिरंजीव भव, विजयशाली भव.)
सर्वजण ओरडतात०--- श्री एकलिंगेश्वराचा जयजयकार. चितोडाधिपति बनवीर महाराजांचा विजय असो.
(देवळापासून दूर अंतरावर बसलेला, दाढीमिशांचे जंजाळ वाढलेला, फाटके तुटके कपडे घातलेला हमीर कर्कश आवाजात गर्जना करतो०--त्याचा सत्यानाश होवो. दुसऱ्यांदा जयजयकार होताच पुन्हा ओरडतो० त्याच्या तोंडात माती पडो. ते आवाज ऐकताच सारे चकित होतात आणि जिकडे तिकडे पाहू लागतात. जयपाळाला तो दिसतो. झपाट्याने तो त्याच्या जवळ जातो.)
जयपाळ०-- हा कोण वेडापीर इथं आलाय? चितोडच्या महाराजाना जयश्री चिंतन करतांच, याच्या कां कपाळाला आठ्या ? (हमीर पुन्हा हातबोटे चोळीत दात खात तेच निषेधाचे शब्द उच्चारतो.) पुन्हा तेच? काय रे? कोण तू? आमच्या बनवीर महाराजांचे नांव काढतांच .......
हमीर०--त्याचा सत्यानाश होवो...........त्याचे कोळसे हावो..........त्याच्या तोंडात माती पडो.
जयपाळ०--( तलवार उपसून) चूप रहा बेशरम राजद्रोही..
हमीर०-- राजद्रोही ? (उठून समोर येतो.) कोण राजद्रोही? तूं राजद्रोही........ तुम्ही सारे राजद्रोही.
जयपाळ०-- ( त्याला ओळखून) कोण? माझा मित्र हमीर? काय रे वनवासामुळे तुझी स्थिति झाली ही. ये..... ये....... मित्रा, मला कडकडून भेट दे. (त्याला भेटायला पुढे होतो.)
हमीर०--हां खबरदार मला शिवशील तर, वनवासानं मला प्रेतकळा आलेली असली, तरी हरामखोर धन्याची सेवा करणाऱ्या गुलामांच्या भपकेदार पोषाकाचं पाप मला मुळीच परवडणार नाही.
जयपाळ०-- हमीर, या पोषाकावरून माझ्या अंतःकरणाची...... त्यात रात्रदिवस धगधगणाऱ्या विवंचनेची...... किंमत करण्याचं धाडस करतोस तूं ? मोठी चूक करतो आहेस तूं. या पोषाकाच्या आत हमिराच्या शुद्ध अंतःकरणासारखं स्वेदेशनिष्ठ नि स्वराज्यनिष्ठ अंतःकरण घडघडत आहे.
हमीर०-- बस् कर तुझ्या स्वदेश नि स्वराज्यनिष्ठेच्या वल्गना. बाप्पा रावळाच्या तेजाचं, कुंभाराण्याच्या बीजाचं नि करुणदेवीच्या शीलाचं अस्सल रजपूत बियाणं आज हिंदुस्थानात असतं, तर जयपाळ, या जुलमी अत्याचारी नि खुनी बनबिराचा दास तूं खास बनला नसतास.
जयपाल०--तुला माझी भूमिका नीटशी उमगली नाही हमीर अजून. माझी राजनिष्ठा.......
हमीर०--आग लाव तुझ्या राजनिष्ठेला. दगाबाजी खून अत्याचारांच्या काजळीनं काळं तोंड करून, मेवाडवर जुलमी सत्ता गाजवणारा तो बदमाष बनवीर, हाच तुझा राजा ना?
जयपाळ०--चुकत आहेस, हमीर, चुकत आहेस तूं.
हमीर०--तर मग या अधमाच्या पायाची धूळ चाटीत कुलुंग्या कुत्र्यासारखा अिथं का तू पडून राहिला आहेस ? अत्याचारी जुलमांच्या घरटात मायदेशाची हाडं कडकडा पिचून तसंच त्यांच पीठ पडत असताना, स्वताच्या प्राणाची न् रुबाबाची पर्वा करणारे तुझ्यासारखे बेमान रजपूत बोकाळले, म्हणूनच बनबिरासारखे नराधम दासीपूत्र चितोडच्या छातीवर टांच देऊन अभे राहिले.
जयपाळ०--हमीर, तोंड संभाळून बोल. माझ्याबद्दल तुझ्या काहीहि कल्पना असल्या, तरी मला बेमान रजपूत म्हटलेल मुळीच खपणार नाही.
हमीर०--कशाला खपेल? हो. इमानाचा मुखवटा घालूनच हा चोरटा मेजवानीला आला ना? विक्रमाजित महाराजानी दिल्दार मनमोकळेपणानं या पाप्याचं आदरातिथ्य केल. आणि........ जयपाळ, त्या काळरात्रीच्या घोर प्रसंगाची आठवण कर. मेजवानीला सुरुवात होते न होते तोंच या कृतघ्न लांडग्यानं ताडकन उडी मारून, महाराजांच्या छातीत खंजीर खुपसला. आणि महाराजांच्या अन्नाला न् चितोडच्या अिभ्रतीला बेमान झालेल्या आपल्या जातभाई रजपूत सरदारानी, मेजवानीची भरली ताटं लाथाडून, राजवाड्यात कापाकापीची कत्तलरात्र केली. काय ? तुझ्या डोळ्याना पाणी?
जयपाळ०--का येणार नाही. हमीर, त्या काळरात्रीची आठवण, काळाच्या काळजाचं सुद्धा पाणीपाणी करील, मग माझी कथा काय? अरेरे, कसली घातकी ती काळरात्र.
हमीर०--राज्यतृष्णेपेक्षा राणी रूपमतीविषयी त्या राक्षसाची विषयवासनाच त्या खुनाच्या मुळाशी होती ना? सारे रजपूत क्षुद्र स्वार्थाला बळी पडून, आत्मद्रोही बनले नसते, तर अिराण अफगाणच्या धाडशी लुटारुंची या हिंदुस्थानाकडं वाकडी नजर फेकायची काय माय व्याली होती. रजपूतच एकमेकांची हाडं कडकडा चावायला सवकले, म्हणूनच अकराव्या शतकात महमद गझनीचा सोटा सोमनाथाच्या टाळक्यावर तडाड़ कोसळला.
जयपाळ०--हमीर, असा त्रागा करून, जुलमी सत्तेचं उच्चाटन होणार नाही. शांतपणानं ..... विवेकानं.......
हमीर०--बस कर तुझ्या शांतीच्या न् विवेकाच्या गप्पा, बदअफलाद बनबिराच्या एका शब्दाचा तरी कुणाला निर्वाळा देता येईल काय? राजकुमार वयात येईतोंवरच मेवाडची राज्यसत्ता मी चालवीन. नंतर बिनतक्रार सत्तासंन्यास करीन, अशी आपल्या साक्षीदार रजपूत सरदारांशी केलेली प्रतिज्ञा तरी त्या नीचानं पाळली काय? उलट, महाराजांच्या तेराव्याच्याच दिवशी कुमार उदयसिंहाचा खून पाडण्याचा त्या राक्षसानं धाडशी प्रयत्न केला. त्या प्रसंगी त्या पन्नादाईनं..... आहा, देवते पन्ना, तुझं नुसतं नामस्मरण केलं तरी हा चितोड न् मेवाडचसा काय उभा भरतखंड उद्धरून जाईल...... त्या महान देशाभिमानी पन्नेनं, आपला पोटचा गोळा बळी देऊन कुमाराला प्राणदान दिलं. जयपाळ, जयपाळ, कुठं ती त्या पन्नादेवीची राजनिष्ठा न् कुठे तुम्हा मिशाळ मर्दांची शांतीची नि विवेकाची पुराणं.
जयपाळ०--माझी विवेकाची भूमिका तुला क्षुद्र वाटणं साहजीक आहे. पण मातोश्री राणी रूपमतीच्या पातित्यावर त्या लांडग्याची झांप पडू नये, म्हणून, हमीर, या जयपाळानं आपल्या नाटकी राजनिष्ठेची ढाल आड धरलेली आहे.
हमीर०--खरंच का हे जयपाल?
जयपाळ०--श्री एकलिंगजी याला साक्ष आहे. अखंड रक्तपाताला सोकावलेल्या बनबिरासारख्या बोक्यापुढं, नीच गुलामाला साजेल, अशा निष्ठेच्या नटवेपणान नाचून, राणी रूपमतीच्या दुक्खाचा कडेलोट सांवरून धरताना, या हतभागी जयपाळाच्या मनाचे आतल्या आत काय धिंडवडे उडत असतील, याची हमीर, तुला कल्पना करता येत असेल तर करून पहा..... उद्या तर तो प्रळयच करणार आहे.
हमीर०--काय करणार आहे?
जयपाळ०--परमारांचा पराभव करून आल्यामुळं, बनवीर विजयानंदानं अगदी बेहोष झाला आहे. राणी रूपमतीन आपलं उघडउघड पाणीग्रहण करून, विक्रमाजिताच्या रक्तानं माखलेल्या सिंहासनावर, बनवीर-पत्नि म्हणून भरदरबारात उद्या बसलंच पाहिजे, असे जबरदस्तीचे यत्न आता चालू आहेत.
हमीर०-आमच्या मातोश्रीवर तो नराधम हात टाकील, तर जयपाळ, माझ्या आईच्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो. उद्याचा सूर्य उगवण्यापूर्वीच हा हमीर त्याचं नरडं चिरल्याशिवाय रहाणार नाही.
जयपाळ०-- खुनाचा यत्न फसल्यावर, हद्दपार झालेल्या उदयसिंहाचा सुद्धा बनबिरानं पाठलाग चालवला आहे. सापडेल तिथं त्याला ठार मारण्याठी, गुप्त वेषाचे पटाईत मारेकरी, देशोदेशी रवाना झाले आहेत. कदाचित्..... या पूर्वीच बिचाऱ्या उदयसिंहाची अितिश्री....
(अकदम नौबदी कर्णे तुताऱ्या वाजतात.)
जयपाळ०--हां. चल, पळ अिथून आता बनबिराची स्वारी देवदर्शनासाठी राजवाड्यातून निघाल्याची शिंगं वाजली. आता तूं अिथ कुणाच्या नजरेला पडलास, तर फुकट प्राणाला मुकशील, चल जा जा, लवकर जा.
हमीर०--उकीरड्याच्या मोलानं जीव गमावणारा हा हमीर नव्हे (जयपाळाच्या कंबरेच्या पट्ट्याला झोंबतो) दे दे, जयपाळ, दे मला तुझा हा खंजीर. आता एकटाच चित्त्यासारखा उडी घेऊन, त्या अधमाच्या नरड्याच्या चिंधड्या चिंधड्या उडवतो.
जयपाल०--हमीर थांब. अशी लाट करू नकोस तुझ्या या अकांडतांडवानं नजिकच्या राजवाड्यातले लोक धावून येतील आणि तूं नि मी अचानक गोत्यात सापडलो का आपल्या सान्या मनोरथांचा डोलाराच जमीनदोस्त व्हायचा. जा आल्या पावली परत जा.
हमीर०--जातो, पण जयपाल, विक्रमाजित महाराजांच्या छातीत घुसलेला तो भयंकर खंजीर, रक्ताच्या चिळकांड्यानी भरलेला तो पंचपक्वान्नाचा थाळा, रक्तांच्या पिचकाऱ्यानी लालबुंद रंगलेल्या त्या चादरी, नि गालिचे, महाराजानी फोडलेली शेवटची ती भेसूर किंकाळी नि मार्ग लोडावर टाकलेली ती मान, जयपाळ आठवण कर, त्या सर्व देखाव्याची आज सहा वर्षांनी पुन्हा आठवण कर, आणि तुझ्या मेवाडनिष्ठ हृदयात सूडाचा धगधगता वणवा भडकत राहू दे.
जयपाळ०--तो देखावा रात्रंदिवस माझ्या डोळयासमोर वावरतो आहे अन् सूडाच्या भावनेलाहि माझं मन पारखं झालेलं नाही. (आत पुन्हा कर्णे तुताऱ्या नौबदींचा आवाज.) ही पहा. त्या बनबिरांची स्वारी जवळ येत चालली. चल, जा जा चटकन निघून जा (पुन्हा शिंगे वाजतात.) चल आटप. या दक्षिण बाजूच्या दरडीवरून घसरत जा, जोहार.
हमीर०--जोहार, (इकडे तिकडे पहात निघून जातो)
(आत०-- राजकन्या कमलादेवी देवदर्शनाला जात आहेत. जाबता बंद, निगा रखो मेहरबान)
जयपाळ०--आस्सं, राजकन्या येत आहे. हमीर गड उतरून गेला का नाही, पाहिलं पाहिजे. (जातो.)
(पूजेचे साहित्य घेतलेली दासी चंचला आणि पाठोपाठ राजकन्या कमला.)
कमल०--चंचले, परमारांचा पराभव करून महाराजानी दिग्विजय मिळवला. म्हणून साऱ्या गडावर आज कितीहि आनंद उसळला असला, तरी या एकलिंगेश्वराच्या मंदिरातला आनंद काही निराळाच असतो, नाही का? वाटतं, रात्रंदिवस अिथंच त्या गाभान्यात बसून, या गौरीहराची मंगल स्तोत्रं सारखी गात रहावे.
चंचला०—ताईसाहेब, आज आपण अगदी दैवी पार्वतीचीच भाषा बोलताहात, अस वाटतं.
कमल०--काहीतरीच बोलावं झालं. कुठे पार्वति माई न् कुठे आपण माणस. देवाची योग्यता माणसाला अशी लावू नये चंचले.
चंचला०--लावू नये खरं. पण आपले शुद्ध विचार नि तसाच हा पांढरा शुभ्र वेष पाहून, हृदयेश्वर महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ही हिमनगजा गौरी तपश्चर्येच्या तयारीत आहे, असाच देखावा मला आता दिसत आहे.
कमल०--गौरीसारखी तपश्चर्या कुणाला साधणार चंचले. तपाच्या तेजानं गौरीनं हराला प्रसन्न करून, जगाला गौरीहर दाखवला.
चंचला०--मग या आमच्या गौरीला राजकुमार भेटून, आज मलूल असलेल्या या कमलाला प्रफुल्लित करणार नाही की काय? एकलिंगेश्वराची सेवा वाया जायची नाही म्हणते
(आता वाद्यांचा गजर होतो.)
-अगबाई महाराजांची स्वारी देवदर्शनाला येत आहे वाटतं.
कमल०--चल आपण पूजा आटपून लवकर परत जाऊ राजवाड्यात. चंचला पूजासाहित्य घेऊन पिंडीजवळ जाते ) थांब थांब चंचले. मी माझ्या हातानीच देवाला साज चढवते. (पिंडीला हार घालते.)
चंचला०--ताईसाहेब ही पहा बिल्वपत्र खाली पडली. गौरीहरानं कौल दिला. राजकुमार उदयसिंह लवकरच येणार गडावर.
जयपाळ०--(प्र.क.) धारानगरीच्या भावी सम्राज्ञीचा जयजयकार असो.
चंचला०--(मोठ्याने ओरडते.) गोषा गोषा जाबत्यावर कोण आहे?
जयपाळ०--घरोब्याच्या मंडळीना कसला आलाय गोषा? गोषा अितराना. जयपाळाला नाही.
कमल०--चंचले, ग हे आपले हप्तहजारी सरदार जयपाळ. असं काय नीट माणूस पाहिल्यावाचून खस् कन् एकाद्याच्या अंगावर जावं.
जयपाळ०--(प्रणाम करीत) धारानगरीच्या भावी सम्राज्ञीचा जयजयकार.
कमल०--जयपाळ, हा प्रणाम का माझी थट्टा?
जयपाल०--कर्दनकाळ बनवीर महाराजांच्या लाडक्या राजकन्येची थट्टा? कोण करील? धारानगरीच्या आजच्या युवराज्ञीनं आणि उद्याच्या परमार सम्राज्ञीनं या राजनिष्ठ जयपाळाचा मुजरा घ्यावा.
कमल०--तुम्ही खास माझी थट्टा करीत आहात.
चंचला०--कदाचित् विनोदाचा एक नवा प्रकार असेल हा. महाराजाना कळला तर?
जयपाळ०--कळला तर? कमलदेवीला ही आनंदाची बातमी प्रथम कळवल्याबद्दल मला शाबासकीच मिळेल.
कमल०-- मी धारानगरीची युवराज्ञी? कुणाशी हा आचरटपणा करता अहात जयपाळ?
जयपाळ०--राजकन्येनं राग मानू नये. हा आचरटपणा नाही कागदोपत्री ठरुन गेलेला सिध्दांत आहे. महाराजानी पराभूत केलेल्या परमारांचे प्रतिनिधि, तहनामाच्या अटीप्रमाणं, उद्या सकाळी भर दरबारात, मंगल आहेराचा राजकन्येला साखरपुडा देणार. आमची राजकन्या कमलदेवी धारानगरीची परमारयुवराज्ञी होणार.
चंचला०--आयया. ही बातमी आम्ही आताच ऐकतो.
जयपाल०--वा या विवाहाच्या टोलेजंग तयारीचे खास हुकूमसुद्धा सर्व खात्याना जाहीर झाले, आणि देवीना अजून पत्ताहि नाही? ... हां. कदाचित् असं असेल. विजयोत्सवाच्या आजच्या दरबारी मेजवानीत, ही मंगल वार्ता देवींच्या कानावर घालून, आपल्या लाडक्या राजकन्येच्या कोमल मनाला साखरधक्का यायचा महाराजांचा विचार असेल.
कमल०--कोण कुठली धारानगरी न् कोण कुठले परमार. जन्मात, त्यांची तोंडहि पाहिली नाहीत मी न् म्हणे, त्याच्याशी माझा विवाह.
जयपाळ०--देवी, हा राजकारणी विवाह आहे. प्रेमकारणी नव्हे. आणि तो बनवीर महाराजानी आपल्या भावी सुखाकडं पूर्ण लक्ष देऊनच ठरवला असला पाहिजे.
कमल०---राजकारणी विवाह म्हंजे प्रेमाचं झालंच मातेरं. आणि प्रेमाशिवाय विवाह म्हंजे प्राणाशिवाय प्रेताचंच जिणं, नाहीतर काय? मला मुळीच न विचारतां, माझ्या दिलाचं दान? देहाच दान? प्रेमाचं दान करायला सुद्धा आम्ही गुलामच वाटते?
चंचला०--हा काय न्याय झाला?
कमल०-- माणुसकी तरी म्हणता येईल का?
जयपाल०--न्यायदेवतेप्रमाणं राजकारण हे सुद्धा आंधळं असून, शिवाय त्याला काळीज मुळीच नसतं. राजकारणाच्या अिभ्रतीसाठीच हा विवाह ठरला आहे न् तो सर्वसमर्थ बनबीर महाराजानी ठरवला आहे. कोण त्याला आता विरोध करणार?
कमल०--त्या अिभ्रतीच्या थडग्याखाली ही कमल जिवंत गाडली गेली, तरी त्याची मग कुणालाच पर्वा नाही, असंच ना जयपाळ?
जयपाळ०--चाणाक्ष राजकन्येला हे काय मी सांगायला हवे? राजकन्यांचे विवाह राजपुत्रांशीच व्हावे लागतात.
चंचला०--तो कसाहि असला तरी ?
कमल०--जयपाळ, प्रेमाच्या स्वयंवराशिवाय, या कमलदेवीच्या जिण्याचा असा राजकारणी विक्रा व्हायचा असेल, तर परमाराना म्हणावं, तुमच्या युवराजाना या बनबीवीरकन्येच्या प्रेताचंच पाणिग्रहण करावं लागेल.
जयपाल०--देवीनी थोडा विवेक करावा. त्रागा करू नये, विवाह राजकारणी असो, नाहीतर प्रेमकारणी असो, ती सुखी किंवा दुक्खी करण्याचे मर्म पतिपत्नीच्याच हाती असते.
कमल०---बाबांच्या राजकारणी जुगारीला मान वांकवण्यापेक्षा, माझ्या हृदयाला जिंकणाऱ्या त्या दिव्य जादूसाठी.... आ हा.... ही कमलदेवी आपल्या जिवाचं रान करायला मागं पुढं पहाणार नाही.
जय०--म्हणे ? ताईसाहेबानी आपल्या हृदयाचं दान आधीच कुणाला केलंय की काय?
चंचला०--या गौरीवर चितोडच्या गौरीहरान आपल्या मायेची पखरण घातली आहे. हो.
जय०--चितोडचा गौरीहर? चितोडचा गौरीहर कोण?
कमल०--चितोडचा हा एकलिंगेश्वर नाही का? याला मी माझं सारं जीवनच अर्पण करून टाकलंय. (चंचलेला डोळ्यानी दटावते.)
जयपाल०--प्रश्न जोवर लाडुकपणाचा किंवा सामोपचाराचा असेल तोवर ठीक आहे. पण राजकारणाची पाषाणहृदयी भूक शमवण्यासाठी, परमाराना राक्षसविवाहाची परवानगी मिळाली, अन् आपली संमति असो वा नसो, आपल्यावर बलात्काराचा प्रसंग आला....
कमल०--तसा तो येईल म्हणता?
जयपाळ०-- शंका आहे की काय? बनबीर महाराजांच्या राजवटीत आज अशक्य असं काय आहे?
कमल०--तसाच मुकाबला बितला, तर माझ्या प्राणेश्वराचं चिंतन करीत आनंदानं मी अग्निकाष्टं भक्षण करीन.
जयपाळ०--महाराणी रुपमतीनं हेच करावं, असंच का आपलं म्हणणं?
कमल०--म्हंजे? तुमचा सवाल समजला नाही नीटसा मला?
जय०--महाराणी रुपमतीनं आपले राजरोस पाणिग्रहण करून, बनबीरपत्नीच्या नात्यानं, उद्याच्या दरबारात सिंहासनावर शेजारी बसलंच पाहिजे. अशा हट्टानं, आज रात्री महाराज रुपमतीवर बलात्कारसुद्धा करतील.
कमल०--राणीसाहेबांवर महाराज बलात्कार करणार?
जय०--तसा प्रसंग आला आहे खरा.
कमल०--नाही नाही. त्रिवार नाही. माझ्या देवाला दिलेल्या वचनासाठी तरी असला प्रसंग राणीसाहेबांवर येऊ देणार नाही मी.
जय०--प्रश्न स्त्रियांच्या अब्रूचा आहे. आणि तो पुरुषापेक्षा स्त्रियाच कुशलतेनं सोडवतील. माझी मति तर अगदी कुंठीत झाली ताईसाहेब. म्हणून आपल्या पायांचा आसरा शोधीत धावत आलो. देवीनीच आपल्या जिवाभावाची पाखर राणीसाहेबांवर घातली, तरच त्यांचा काही बचाव होणार आहे. आपण धीर सोडलात...का.......साराच अंधार.
कमल०--जयपाळ, मुळीच घाबरू नका तुम्ही, हा बाप्पा रावळाच्या पुण्याईचा चितोडगड आहे. बायकांच्या अब्रूचा प्रश्न निघाला, तर सारा गड जोहाराच्या हल्लकल्होळाने भडकून, आकाशाच्या छताची राखरांगोळी करील. पण कोणाहि पाप्याचा हात निष्पाप पतिव्रतेच्या पदराला स्पर्श करू शकणार नाही.
जयपाळ०--तशी अितिहासाची साक्ष आहे खरी, प...ण..... कालमाहात्म्याबरोबर अितिहास सुद्धा परंपरेला पारखा होतो.
कमल०--नाही होणार. बाबांच्या प्रेमाला गदागदा हालवून, मी त्यांची बुद्धि पालटीन. त्यात मी फसलेच तर माझ्या गौरीहराची शपथ घेऊन सांगते, राणीच्या पदराला हात घालायला बनवीर महाराजाना कमलचं प्रेतच तुडवीत जावं लागेल.
(दासीसह जाते.)
(शिंगे कर्णतुताऱ्यांच्या घोषात, मेवाड़ाधिपति बनबीर महाराज की जय, अशा गर्जना, प्रत्येक गर्जनेला समोरच्या बाजूने विक्रमाजित महाराजकी जय.... राणा उदयसिंहकी जय, अशा विरोधी गर्जनांची उलट सलामी मिळते. छत्र मोर्चेले उडत आहेत, अशा लवाजम्यानिशी संतापाने खवळलेला बनवीर प्रवेश करतो.)
बनवीर०--निमकहराम बण्डखोर. विक्रमाजिताचा जयजयकार? (आतून तसा जयजयकार होतो.) उदयसिंहाचा जयजयकार? (तोच जयजयकार आतून. याशिवाय, बनवीराचा सत्यानाश, सत्यानाश, सत्यानाश, अशा आरोळ्या ओकू येतात.).
.... जा. त्या राजद्रोही बण्डखोराला आत्ताच्या आत्ता गिरफदार करून अिकडं घेऊन या. (काही सेवक जातात.) जयपाळ, परमारांचा पराभव करून, विजयोत्सवात देवदर्शनासाठी आम्ही आलो असतां. आमच्या सत्तेचा अपमर्द?
जयपाळ०--किती पापी धाडस है?
बनवीर०--परस्पर वैराच्या वाळवीनं विस्कळीत झालेली रजपुतांची राज्यसत्ता, भरभक्कम पायावर उभारण्यासाठी, मेवाडचा राजदण्ड हाती घेण्याची आम्ही मेहरबानी केली. गेल्या सहा वर्षात राजद्रोही बण्डखोरांचा नायनाट करून, उभा मेवाड आम्ही आमच्या कदरबाज शिस्तीखाली एकवटला.
जयपाळ०--सारी दुनिया उघड्या डोळ्यानी हे पहात आहे.
(काही सेवक एका तरुणाला पकडून आणतात. बनवीर महारजकी जय असा जयघोष करतात. तो तरुण राणा उदयसिंहाचा जयजयकार अशी गर्जना करतो.)
बनवीर०--चूप रहा बदमाष. जयपाळ, या हरामखोराची जीभ आत्ताच्या आत्ता आमच्या समोर छाटून टाक.... कां? अशी काकूं कां?
जयपाळ०-- (बावरून खंजीर काढीत) बन्दा..... हुजूरच्या...... हुकमाचा...... ताबेदार......
तरूण०--(जयपाळाल) धि:कार धि:कार, त्रिवार धि:कार तुझ्या मुर्दांड बीजाला न् ब्रीदाला.
बनवीर०--अडाव हरामखोराची जिभली सफाचाट.
तरूण०--जिभल्या सफाचाट छाटून आमच्या जळत्या विचारांची भडकती आग तूं थोडाच विझवू शकशील? तुझ्या राक्षसी संतापाच्या होमात धडाड् उड्या घेणाऱ्या शेकडो जिवांचे शाप, प्रत्येक क्षणाला तुझ्या खुनसट राजदण्डाचे कोळसे कोळसे करीत आहे. हे ध्यानात ठेव. आतापर्यन्त हज्जारो जिवांची हत्या केलीस, तरी मदान्ध बनबिरा, विक्रमाजिताच्या रक्ताच्या थेंबा थेंबासाठी, तुझ्या नरड्याच्या चिंधड्या चिंधड्या उडवायला खवळलेला वेताळ काही ठार मेला नाही. उदयसिंहाचा जयजयकार, बनबिराचा सत्यानाश.
बनवीर०--बनबिराच्या सत्तेची बदनामी?
तरूण०--लाख वेळा करीन.
बनवीर०--(तरुणाच्या पोटात तरवार खुपशीत) हे घे राजद्रोहाचे प्रायश्चित.
तरूण०--(तडफडत मरता मरता) उदयसिंह झिंदाबाद, बनबिराचा सत्यानाश.
चितोड..... चितोड़.....चि..तो...ड...(मरतो.)
जयपाळ०-- किती उलट्या काळजाचा राजद्रोही हा. (सेवकाना) जा हे प्रेत जिथूनं घेऊन. सरकार स्वारी देवदर्शनाला आलेली न् हा अमंगळ देखावा अिथं कशाला? जा. उचला (सेवक प्रेत नेत असताना) त्याच्या धर्माप्रमाणे त्याचे शेवटचे संस्कार करा.
बनबीर०--राजद्रोही बण्डखोराना कसला धर्म न् कसला संस्कार, लाथेच्या ठोकरीनं द्या ते प्रेत गडाखाली ढकलून. कोल्ही कुत्री गिधाडे त्याचे लचके तोडताना पाहून, मेवाडाधिपति बनबिराच्या सत्तेचा क्षुल्लक अवमान करणारांची काय दशा होते. याची उरल्यासुरल्या माथेफिरूना चांगलीच दहशत बसेल.
जयपाळ०-- खावंदांचं करणंच रास्त न् न्यायाचं...... हुजूरनी आता देवदर्शन घ्यावं.
बनबीर०-- (लवाजम्याला) जा. तुम्ही सारे सेवक गुलाम, महाद्वारावर आमची रहा पहात उभे रहा. (लवाजमा प्रणाम करून जातो. बनवीर गाभाऱ्याजवळ जातो. भटजी त्याला बिल्वपत्रे देतो. ती तो पिंडीवर उधळतो आणि नमस्कार करून परत येतो.)
जयपाळ, तरूण रजपुतांत असला माथेफिरूपणा बोकाळलेला पाहून, आम्हाला फार आश्चर्य वाटतं. ही सारी भुतावळ उदयसिंहानंच उठवलेली असावी, असं नाही का तुला वाटंत?`
जयपाळ०--सरकार, वावटळ येते न् जाते. पण तिचा आगापिछा उमगणं, कठीणच काम.
बनवीर०--पण या वावटळीची जरूरच काय? राजकुमाराचं मोकळ्या मनानं स्वागत करायला आम्ही तयार असतां, आमच्या या मेहरबानीचा धि:कार करून, भणंग भिकाऱ्याप्रमाणं रानावनात वणवण भटकण्याचं दुर्भाग्य त्यानी कां पत्करावं, या त्याच्या मनाच्या ठेवणीचा तुला काही अंदाज घेता येतो काय ? विक्रमाजिताचा अकाल मृत्यू होतांच.....
जयपाळ०--(स्व) हो. खून म्हंजे अकाल मृत्यूच तो.
बनबीर०--नुसत्या परंपरेच्या पुण्याईनं उदयसिंह बालराजा गादीवर बसता, तर जयपाळ, एकमेकांची हाडं फोडायला सवकलेल्या, तुम्हा पागल रजपुतांच्या बेबंदशाहीच्या थडग्याखालीच तो जिवंत गाडला जाता आणि या चितोडावर मुसलमानांचा चान्दतारा हमखास फडकला असता.
जयपाळ०--यात मला तर मुळीच शंका वाटत नाही.
बनबीर०--बेबन्दशाहीची पाळंमुळं खणून काढून, रजपुती सत्तेचा विस्ताराचा मार्ग आम्ही बिनधोक खुला केला. आणि चितोडच्या दराऱ्यानं उभा हिंदुस्थान धाकात ठेवला. आज चितोडची राजगादी म्हणजे बिनकाटेरी गुलाब पुष्पांची शय्या बनवली आहे आम्ही. वचनाप्रमाणं ती उदयसिंहाच्या हवाली करायला आम्ही तयार असतां, त्यानं निव्वळ खोडसाळ द्वेषानं आमच्या सत्तेविरूद्ध दिल्लीच्या पातशहाकडं गुप्त खलबतं करावी, हे काहीसं चमत्कारीक नाही का?
जयपाळ०--चमत्कारीक तर खरंच सरकार.
(म्हातारा कर्णपाल सरदार प्र.क.)
कर्णo--राजाधिराज बनवीर महाराजांचा जयजयकार असो.
बनवीर०--कोण? कर्णपाल? काय बातमी घेऊन आलास? आनंदाची का दुक्खाची?
कर्ण०--दुक्खाची ? आता वाऱ्याच्या झुळकीवरसुद्धा दुक्खाला थारा मिळेनासा झाला आहे सरकार. चितोडगडाला न् खुद्द महाराजाना माझ्या बातमीचं मोल करता करवणार नाही. उदयसिंहाचा अवतार संपला.
जयपाळ०- -(दचकून) उदयसिंहाचा अवतार संपला?
बनवीर०--का? जयपाळ, या बातमीनं तूं अितका? पाण्ढरा फिकट? तो आमचा कट्टा दुष्मन नव्हता का?
जयपाळ०--म्हणूनच मला आश्चर्य वाटलं सरकार. कोणत्या मर्दानं सरकारच्या कपाळी हा यशाचा टिळक लावला ? काय, तपशील तरी काय आहे कर्णपाल?
कर्णपाल०--राजकुमार प्रथम दोन तीन वर्षें आग्रा येथे हुमायून बादशहाच्या आसऱ्याला होता.
बनवीर०---पण त्याच्यामागे तो शेरशहा शनीसारखा लागला आहे ना?
कर्ण०--होय सरकार, हुमायूनच जिथं पळपुटीच्या घसरणीला लागलेला, तिथं तो या पळपुटचा राजपुत्राला कितीशी मदत करणार? आग्र्याहून उदयसिंह रोठज येथे शेरशहाला शरण गेला.
बनवीर०--परधर्मी शेरशहाला शरण?
जयपाळ०--मूर्तिमंजक सैतानाशी संगनमत?
बनबीर०--त्या पोराच्या नादी लागून, शेरशहा मेवाडवर चाल करून येता, तर त्याच्या तोंडावर आमचा दोस्त गुजराथचा बहादूरशहा सोडून, आम्ही काट्याने काटा उखडला असता.
जयपाळ०--आणि खुद्द खावंदानीच त्याचा पार धुव्वा उडवायला काय कमी केल असतं?
बनवीर०--अलबत, पण जयपाळ, राजकारणात अजून तूं कच्चा आहेस.
जयपाळ०--अगदीच.
बनवीर०--दैत्यांवर दैत्य घालून देवानी जय मिळवला, तरच ते राजकारण. बरं, पुढं काय झालं?
कर्ण०--अिकडून रवाना झालेल्या दोन मारेकऱ्यांनी उदयसिंहाला अखेर कनोज येथे गाठला. तिघांचा भयंकर अटीतटीचा सामना झाला. राजकुमारसुद्धा काही सामान्य असामी नव्हता. पहिल्या झटापटीतच त्याने एका मारेकऱ्याला ठार लोळवला. पण शेवटी दुसऱ्या जोडीदारानं मात्र मात केली. त्याच्या खंजिरानं उदयसिंहाच्या काळजाचा बिनचूक ठाव घेतला.
बनवीर०—-फुटक्या कपाळाच्या कृतघ्न पोरा. तुटली...... तुटली तुझ्या पोरकट महत्त्वाकांक्षेची वावडी. परधर्मियांचे आंगठे चुखण्यापेक्षा, तुझ्या आजाचं-- संगराण्याचं रक्त नसानसात खेळवणाऱ्या या स्वधर्मी चुलत्याची मनधरणी तुला बेअिभ्रतीची वाटावी काय?
जयपाल०--चुलता म्हणजे पिता.
बनबीर०--पण या पित्याला रक्तपित्या समजून, त्या उद्दाम पोरानं जाणूनबुजून माझ्या मेहरबानीचा धि:कार केला.
कर्ण०--दैव देतं न कर्म नेतं, ते हे असं.
बनवीर०--जयपाळ, तुझ्या राजनिष्ठेबद्दल आमची बालंबाल खात्री पटलेली आहे. तरीसुद्धा तुझं अिमान कसोटीला लावून पहाण्याची आमची लहर लागत आहे. दिल्दार जयपाळ, शास्त्रशुद्ध विवाहाच्या बंधनानं राणी रुपमति माझ्याशी एकजीव झाल्याशिवाय, आमच्या मस्तकारवरचा राजकिरीट केव्हांही डळमळीतच रहाणार. तूं आत्ताच्या आत्ता जाऊन राणीची भेट घे. तिला सांग, अल्पायुषी नवन्याच्या पापासाठी, सोनेमोल आयुष्याच्या मातीचा चिखल, अश्रूंच्या अखंड पाटानी भिजवीत बसण्यापेक्षा, त्या हतभागी नवऱ्याची राज्यलक्ष्मी मनगटाच्या जोरावर हस्तगत करणाऱ्या आमच्या सारख्या दिग्विजयी पुरुषोत्तमाची पट्टराणी होऊन देवानं दिलेल्या आयुष्याचा. तारुण्याचा आणि सौंदर्याचा सदुपयोग कर, अशी राणी रुपमतीची तूं खात्री पटवली पाहिजेस.
जयपाळ०--यशापयश देवाधीन, प्रयत्नात कसूर करणार नाही.
बनवीर०--ती आमची खात्री आहे. जा. आत्ताच्या आत्ता धावत जा. तिच्या पुत्राच्या मृत्यूची बातमी तिच्या कानांवर जाऊन, मनोविकारांच्या सर्व कोमल भावनाना ती पारखी होण्यापूर्वीच तिच्या पाणिदानाची संमति तू मिळवली पाहिजेस. मनाच्या वेगानं जाऊन, तितक्याच तातडीनं राणीच्या मनाला काबीज कर. तिच्या प्रेमदानाचं स्वागत करायला. प्रेमाचे पंख लावून, तुझ्या पाठोपाठ आम्ही आलोच समज, जा.
जयपाल०--जोहार (जातो.)
बनबीर०--कर्णपाल, आत्ताच आपण खरी मात केली. आता मी मेवाडचा खराखुरा अधिपति झालो. आम्हाला आता एकसुद्धा प्रतिस्पर्धि उरला नाही. विक्रमाजिताच्या राज्यलक्ष्मीप्रमाणंच त्याची पट्टराणी आमची अर्धांगी झाल्यावर, बनबिराची ही विजयी समशेर, दिल्लीला पालथी घालून, काबूल कंधारच्या डोंगराळ मुलखात पराक्रमाचा धौशा गाजवण्याची कामगिरी हाती घेणार आहे.
कर्ण०--योग्य.... रास्त..... वाजवी.
बनवीर०--आता तूं एक नाजूक काम केलं पाहिजे. राणी रुपमतीनं आपले वैधव्याचे अश्रू पुसून, शास्त्रशुद्ध विवाहानं आम्हाला निष्कलंक प्रेमाचं पाणिदान करायचं निश्चित ठरवलं आहे, अशी दे अक कण्डी तू लोकांत फैलावून.
कर्ण०--पण राणी वश होण्यापूर्वीच ?
बनवीर०--तिच्या खुषिनाखुषीची कोण पर्वा करतो. बेलाशक दे ही बातमी फैलावून सगळ्या गडावर. सामोपचारानं ती वळली नाही, तर जबरीनं तिला अंकित केल्याशिवाय आम्ही रहाणार नाही. बनबिराच्या अिच्छेला विरोध ? परमेश्वराची छाती नाही, मग या बंदिवान् रुपमतीची काय प्राज्ञा.
कर्ण०--वाहवा. ही शक्कल मात्र नामी खरी, स्वयंभू सत्ताधीशांखेरीज असले मुकाबले पार पडत नसतात. जबरदस्ताच्या जबरीची जरब. गाभण नसेल तीहि गाभ टाकील.
बनवीर०--कर्णपाल, परमारांवर मिळवलेल्या विजयाच्या आनंदोत्सवासाठी आजची सारी रात्र मेजवान्या, नाचगाणे.......
कर्ण०--आणि मंदिरापानात........
बनवीर०--घालवण्याची आमची अिच्छा आहे.
कर्ण०--आणि ती योग्य वाजवी न् रास्त आहे सरकार,
बनवीर०--आमच्या सर्व लढाऊ सैनिकानी सुद्धा आजची रात्र बेहोष आनंदात घालवावी, म्हणून आमच्या खास मयागारातल्या कंधारी अनार मद्यार्काची सर्वांना सर्रास सवलत आम्ही देत आहोत.
कर्ण०--द्वारकेच्या यादवांवर ताण.
बनवीर०--फक्त गस्तीच्या शिपायाना मात्र सक्त मनाई आहे.
कर्ण०--आणि ती वाजवी योग्य आणि रास्तच आहे. गस्तीचे शिपायी मस्तीला आले का सान्या बंदोबस्ताला बस्तीच मिळायची. असली नसती सुस्ती काय कामाची.
बनवीर०--जा तर मग. आमच्या वैभवशाली मेजवानीच्या व्यवस्थेचे हुकूम जारी कर.
कर्ण०--जो हुकूम, जोहार (जातो.)
वनवीर०--(स्व.) आत्ताच्या मेजवानीच्या प्रसंगीच राणी रुपमति माझ्या मागणीचा स्वीकार करून, शेजारी बसेल, तर माझ्या आनंदाला सीमा उरणार नाही. या रजपूत स्त्रियांचा मानीपणा एरवी कुणाला कितीहि कौतुकास्पद वाटला, तरी माझ्यासारख्या दिग्विजयी नरकेसरीचा अिच्छाभंग होत असताना, त्या मानीपणाची मान्यता कोण मानी मान्य करील?....खरं पाहिलं तर रुपमतीच्या बापाजवळ प्रथम मी तिला मागणी घातली. पण पृथ्वीराजाचा मी दासीपुत्र, या सबबीवर त्या उर्मटानं माझ्या मागणीचा धिःकार करून, तिला विक्रमाजिताच्या बाशिंगाला आवळली. बनबीर दासीपुत्र आं? पण आज याच दासीपुत्राच्या सत्तेखाली शुद्धबीजाचे हे घमण्डखोर रजपूत माना वांकवून उभे आहेत ना? गुलामगिरीच्या बेशरम फासात माना अडकल्या असताना सुद्धा, शुद्ध रक्ताच्या न् शुद्ध संस्कृतीच्या गप्पा झोडणाऱ्या हिंदूंच्या या पागलपणाला उपमा देताना शरमेलाहि शरम वाटली पाहिजे........ पण रुपमति, तुला माझ्या मागणीला बिनतक्रार मान वाकवलीच पाहिजे. मोठमोठ्या मानधनप्रभूंच्या मानावांकवून, त्याना माझ्या पायांवर लोळण घ्यायला लावणारा हा बनबीर, या काळाच्या काळाशी गाठ आहे. सामोपचाराची कालमर्यादा संपल्याबरोबर, नादान गुलामानी धेर माजवलेल्या नीतिशास्त्राच्या नरड्यावर टांच देऊन, रुपमति, तुझ्या निरीला हात घातल्याशिवाय हा बनबीर रहाणार नाही.
अंक पहिला समाप्त.
अंक २ रा
प्रवेश १ ला
स्थळ आणि पात्रे : राजवाड्याचा महाल (कव्हर) विचारमग्न बनबीवीर शतपावली करीत फिरत आहे.
बनबीर०--(स्व.) काय बरं हे गूढ असावं? उदयसिंहाच्या खुनाची बातमी इतक्या झटपट हिच्या पर्यन्त कशी गेली?... जयपाळ? जयपाळनं तर सांगितली नसेल?... पण असं होणार नाही. त्यानं आपल्या इमानाची साक्ष हरवख्त चोख पटवलेली आहे.
(कर्णपाल येतो.)
कर्ण०--बनबीर महाराजांचा जयजयकार.
बनबीर०--कोण? कर्णेपाल? अगदी वेळेवर आलास. संताप नि निराशा यानी माझ्या हृदयात घुसळण घातली असतां, मनाला धीर देण्यासाठी तुझीच जरूरी होती.
कर्ण०--महाराजांची अिच्छा हात जोडून मूर्तिमंत उभी आहे.
बनबीर०--कर्णपाल, ती हेकेखोर रूपमति...
कर्ण०--काय, जयपाळला सुद्धा वश होत नाही?
बनबीर०--आमच्या खास मनधरणीलाहि ती जुमानीत नाही. आम्ही आत्ताच तिची भेट घेअन आलो, उदयसिंहाच्या खुनाची बातमी तिच्या कानी इतक्या झटपट कशी पडली कोण जाणे. त्यामुळे सारं गादहा एकदम बिथरलं. जयपाळानं तरही चुगली केली नसेल?
कर्ण०--अशक्य. अगदी अशक्य. सरकारची शंका अस्थानी आहे. जयपाळासारखा हाडाचा चोख माणूस मी आजवर कधि पाहिला नाही.
बनबीर०--मग सात पहाऱ्यांची तटबंदी फोडून ही बातमी राणीला बिनचूक कशी मिळाली?
कर्ण०--बातम्या न बायका, शिंदळीच्या दोघीही पळण्यात पटाइत. बोल बोलता स्वर्ग पाताळाचा ठाव घेऊन पृथ्वीवर हजर. गडावर ही बातमी सगळीकडे ज्याच्या त्याच्या तोंडी झाली आहे. बायकांची तोण्डं म्हंजे बिनबुडाचं भांड. तिथं काही टिकायचं नाही. रूपमतीच्या दिमतीच्या एकाद्या फटाकड्या बटकीचं तोंड कुठंतरी लागलं असंल अन् तिनं ही बातमी तिला सांगितली असंल.
बनबीर०--त्या अवदसेला शोधून काढून ठार मारली पाहिजे.
कर्ण०--बेषक बेषक. जीभ कापून जीव घेतला पाहिजे. हासुद्धा राजद्रोहच आहे..... पण सरकार, रूपमति म्हणते तरी काय?
बनवीर०--मी तिची मनधरणी केली, हवी ती लालूच दाखविली. अखेर दटावणीचा वळसाहि दिला. पण या तीनीहि उपायानी तिच्या हट्टी स्वभावापुढं हात टेकले. मी एवढा काळाचा काळ, पण माझ्या शब्दाला ती रतिमात्र भीक घालीत नाही.
कर्ण०--सरकार, आपलं थोडं घसरलं... फारसं नाही चुकलं.... पण घसरलं. जयपाळाच्या खटपटिंचा अंदाज घेण्यापूर्वी राणीच्या तोंडाला तोंड देण्याची खावन्दानी उगाच घाई केली. अहो ही बायकांची जात भाटीसारखी मोठी हट्टी. धरायचं ते धरतील, करायचं ते करतील, पण गुरगुरण्या, फुसफुसण्यानं सारा गाव उठवणीला आणतील. पडछाया न् बाया. एकाच सूत्रागोत्राच्या. आपण जों जों त्यांच्या पाठी लागावं, तों तों त्या टिकलीच्या पाठ दाखवून पळतात. पण तुम्ही त्यांच्याकडं पाठ फिरवा मात्र, का चिकटल्याच येऊन त्या पोटाला.
बनबीर०--तरुणीच्या प्रेमयाचनेत म्हातारे बुद्रुक बरेच वाकबगार असतातसं दिसतं.
कर्ण०--सरकार, प्रश्न अनुभवाचा आहे. रंगेल प्रेमाला ही काळ्या पांढऱ्या रंगाची कसोटी बिनचूक उमगते. काळा कुळकुळीत केसांच्या पार्वतीन पांढन्याशुभ जटादाढीमिशीच्या म्हाताऱ्या शंकरासाठी काय उगाच घोर तपश्चर्या केली? त्याने तिला कितीतरी झिडकारली, फिडकारली पण अखेर पार्वतीनं शंकराच्याच गळ्याला मिठी मारली ना?
बनबीर०--तारुण्यापेक्षा केसांच्या रंगाची महति विशेष असते म्हणतोस?
कर्ण०--आकर्षणशास्त्रातला हा मोठा गमकाचा मुद्दा आहे सरकार. काळ्याभोर केसांपेक्षा, पिंगट भुऱ्या केसांच्या तरुणीकडे सगळ्यांचे डोळे चटकन वळतात. ते काय उगाच? काळ्या डोळ्यांपेक्षा घाऱ्या डोळ्यांची चमक काही न्यारीच असते. काळ्या डोक्यांची तरूण मंडळी पांढऱ्या केसांची टर उडवतात आणि कित्येक पोक्त शहाणे आपल्या पांढऱ्या केसांना कलप चोपडून काळे करण्याची धडपड करतात. पण त्या दोघाहि मूखांना पांढऱ्या रंगाचं रंगेल माहाल्य मुळीच उमगलेलं नसतं.
बनवीर०--पांढऱ्या केसांना काय इतक माहात्म्य आहे?
कर्ण०-- पांढऱ्या केसांच्या मुत्सद्यांशिवाय आजवर एक तरी राजकारण पार पडलं आहे का सरकार? राजकारणाप्रमाणंच प्रेमप्रकरणात सुद्धा पांढऱ्या केसांची मध्यस्थी तितकीच उठावदार वठत असते. लग्न जुळवण्याच्या मोहिमेवर काळ्या केसांच्या कच्च्या तरुणांपेक्षा पांढन्या केसांचे पक्के दर्दी बुद्रुक काय उगाच जातात. खावंद, पांढरे केस म्हंजे बायकांच्या घोळक्यात बिनदिक्कत घुसण्याचा राजरोस परवाना. शिवाय, पांढऱ्या केसांचे तरूण अलिकडे बायकांना फार आवडतात आणि म्हाताऱ्यांच्या कामचेष्टा कितीहि खोडकर असल्या तरी चिडखोर बायका फारशा वर्दळीवर येत नाहीत.
बनबीर०--पांढऱ्या केसांच्या कर्णपालाऐवजी काळ्या केसांचा जयपाळ राणीकडं पाठवण्यात चूकच झाली म्हणायची आमची.
कर्ण०--छे छे छे छे, चूक आणि सरकारकडून? व्हायची नाही. सगळाच व्यवहार त्रयराशिकी पद्धतीनं करून थोडच चालणार? एका बाईला पाच पोरटी म्हणून दहा बायकांना पन्नास कारटी थोडीच होणार? सम व्यस्त, शक्याशक्य, पात्रापात्र सगळंच. नीट पहावं लागतं. रुपमतीपुढं हा कर्णपाल म्हंजे महिषासुर मर्दिनीपुढं टोणगाच म्हटला तरी चालेल. खावंद, राणीच्या वशीकरणाची कामगिरी माझ्यापेक्षा जयपाळच चोख बजावील. अहो, तरुण तरुणी सगळे छांदिष्ट, एकदा एखाद्या गोष्टीचा छंद घेतला, का त्याच्यासाठी जीव द्यायचा. मोठे हट्टी, आपली ही राजकन्याच घ्या ना.
बनबीर०--राजकन्या? कमलनं काय केले?
कर्ण०--मेजवानीची सारी तयारी झाली न् हिचा पत्ताच नाही.
बनबीर०--पत्ताच नाही? गेली कुठं मग ती?
कर्ण०--सारा राजवाडा पालथा घातला.....
बनबीर०--रूपमतीकडं तर गेली नसेल?
कर्ण०--तिकडेहि शोध केला,
बनबीर०--मोठी हट्टी पोर, चितोड जिंकला, त्या दिवशी सकाळी आम्ही या कमलचं तोंड पाहिलं. भाग्याची पोर, म्हणून राजकन्येसारखी हिला आम्ही वाढविली. हिच्या हट्टीपणाचा आम्हाला पुष्कळ वेळा राग येतो. पण ती गुणाची पोर समोर आली, का सारा राग जागच्या जागी जिरतो. कर्णपाल, कमलला कुणी काही बोललं तर नाही ना? (दूर पाहून) ती... ती... ती कोण तिकडं चालली आहे?
कर्ण०--ती. ती ती... बटकिची चंचलादासी... अग ए फटाकडे, इकडे ये (चंचला येते.) राण्डलेक, चिचुंद्री, बिजलीसारखी इकडून तिकडं. तिकडून इकडं कंबर लचकावीत, मान फलकावीत न् डोळे मिचकावीत चमकतेस, पण राजकन्या कमलदेवी कुठे आहे?
चंचला०--ताईसाहेब आत्ताच एकलिंगेश्वराच्या देवळाकडं गेल्या.
बनबीर०--दर्शन घेऊन नुकतीच ती आली होती ना? मग पुन्हा कशाला गेली? बरोबर कोण आहे ?
चंचला०--कुणी नाही. पाठोपाठ मी जात होते, तर मला दटावून म्हणाल्या, नको येऊस माझ्या मागं, मग मी काय करणार सरकार.
बनबीर०--मलाच जाऊन तिची समजूत घातली पाहिजे. (जातो.)
(चंचला जाऊ लागते.)
कर्ण०--अग ए. चटकचांदणी. अगदी लांडोरीच्या फणकाऱ्यानं चाललीसशी?
चंचला०--माझ्यामागे कामे आहेत.
कर्ण०--काम सगळ्यांच्याच मागं लागलेला आहे. थोडी थांबलीस, तर काय माझ्या उभाऱ्यांनं तुझ्या मखमाली नखऱ्यात गरममसाला पडेल?
चंचला०--म्हातारे बाबा.
कर्ण०--तुझा बाप म्हातारा, म्हातारा म्हातारा कुणाला म्हणतेस? मला तुं दुसऱ्या लाख शिव्या दे, पण म्हातारा शिवी देशील. तर नाक चिरून मिरच्या भरीन.
चंचला०--म्हातारा ही कधिपासून शिवी झाली बाई? आता तुम्हाला म्हातारा नाही म्हणायचं, तर काय तरूण म्हणून आरत्या ओवाळायच्या?
कर्ण०--आढीतल्या पाडापेक्षा पिकल्या आंब्याचा दर्जा केव्हाहि मोठाच, वयानं म्हातारे, मनानं म्हातारेच असतात, असा काही नेम नाही. तारुण्याच्या भरअमदानीत म्हातारे बनणाऱ्या तकलादी तरुणापेक्षा, म्हातारपणच्या भर अवसानात तारुण्याची कळी टिकवणाऱ्या, माझ्यासारख्या कळीदार जवानाशी, तुझ्यासारखी तरुण फटाकडी, जरा बोलली चालली, किंचित हसली खेळली. जरा नाचली बागडली....
चंचला०--(स्व.) म्हातारा आज रंगात आलाय,
कर्ण०--तर काय चटदिशी तूं म्हातारी होशील, दासीची कुत्री बनशील, बाईचा बुवा होशील, काय होशील तरी काय?
चंचला०--माणूस जसजसं म्हातारं होत जाते, तसतसे त्याला तरुणपणचे रंगढंग करण्याची तलफ जास्त येते. शोभतो का या वयात हा चारगटपणा?
कर्ण०--न शोभायला काय झालं? तारुण्याच्या घिसाडघाइत थातूरमातूर उरकलेले रंगरंग, प्रौढ वयाच्या अनुभवी अवसानात यथासांग वठवता येतात.
चंचला०--वय गेली तरी नजर.......
कर्ण०--अजून जशीच्या तशी कायम आहे. आम्ही तुमच्याकडं निरखून कळवळ्यानं पाहती, पण राण्डेच्यानी, तुम्ही आमच्या डोळ्याला डोळासुद्धा मिळवीत नाही. बायकांच्या जातीला तरी असला अरसिकपणा शोभत नाही..... बरं ते जाऊ दे..... राजकुमाराची काही बातमी समजली आहे का तुला?
चंचला०--राजकुमाराची बातमी? राजकुमार कोण? बनबीर महाराजाना कधि झाला राजकुमार? तो तर विधूर.
कर्ण०--अग चंवढाळ सटवे, मला बनवतेस काय तूं? राजकुमार उदयसिंहाची तुला काहीच माहिती नाही म्हणतेस?
चंचला०--उदयसिंह? साऱ्या रजपुतान्याभर सिंह, सिंग, पाल, बीर न् वीर बोकाळले आहेत. त्यांच्या उठाठेवी आम्हा बटकीना काय करायच्या? दिल्या दामाची न् सांगितल्या कामाची आम्ही माणसं. आम्हाला काय चाटायचं ते सिंह न् सिंग. आजीचा, आज कन्दाहारी अनार मदिरेच्या कोठाराच्या किल्ल्या हाती आल्या आहेत. म्हणून मेजवानीच्या आधीच नैवेद्य केलेला दिसतो. (जाते)
कर्ण०--(स्व.) या मिरकीच्या दासी मोठ्या फिरकीच्या असतात. कसा मला हिन वरच्यावर उडवला हो. खोल विहिरीचं पाणी काढता येशील, पण तरुणींच्या मनाच्या बोकलावर नुसते डोकावण्याची पंचाइत. (जातो)
प्रवेश २ रा
स्थळ, स्थिति नि पात्रे : एकलिंगेश्वराच्या गाभाऱ्यात कमल हात जोडून अश्रु ढाळीत आहे. बनबीर तिला हाका मारीत येतो.
बनबीर०--कमलदेवी, कमलदेवी, कमल... कुठं गेली ही एकटीच.
कमल०--(गाभान्यातून बाहेर येत) कोण? बाबा? ही मी अिथं आहे.
बनबीर०--(तिच्या डोळ्यात आसवे पाहून) कमल, साऱ्या चितोडगडावर आनंदोत्सव चालू असता, तुझ्या डोळयाना पाणी? हव्या त्या वेळी आसवं गाळणं, हा तुझ्या करमणुकीचा खेळ तर नाही ना होऊन बसला?
कमल०--अश्रूचा खेळ कधि कुणी खेळतं का बाबा?
बनबीर०--मग हा तुझा मूर्खपणा तरी होत असला पाहिजे. तुला माझं वाढत ऐश्वर्य पाहवत नाही का?
कमल०--बाबा बाबा बाबा, किती अघोरी कल्पना केलीत ही. या कमलच्या मनाची अखेर हीच का पारख केलीत?
बनबीर०--मग तुझे डोळे पाण्यानी कां भरले आहेत?
कमल०--आनंदाचा दंहिवर आणि करुणेचा गंहिवर, मनाच्या पाझरणीतनं झिरपू लागला, म्हणजे या कमळाच्या पाकळ्या अशाच डबडबतात.
बनबीर०--आता तूं आनंदाच्या दंहिवरात आहेस, का . . . . .
कमल०--करुणेच्या गंहिवरात आहे बाबा. राणी रूपमतीच्या वतीनं आपल्यापाशी मला एक याचना करायची आहे.
बनबीर०--श्रीमंतांच्या लाडक्या पोरी असल्याच भानगडी खेळवीत असतात. रूपमतीच्या वतीनं याचना, बहुतकरून ती आमच्या अिच्छेचा मानभंग करणारीच असणार. बोला बोला काय तुमची याचना आहे ती.
कमल०--परमारांशी घोर संग्राम करून आपण विजयी झाल्यामुळं, राणीच्या मनात आपल्याविषयी भयंकर धास्ती उत्पन्न झाली आहे.
बनवीर०--तशी ती दिल्लीपति हुमायुनाला नि त्याचा प्रतिस्पर्धी शेरशहालाहि झाली आहे. राणी रूपमतीला तसल्या धास्तीचा संबंध काय?
कमल०--बाबा, राणीच्या भावनांची आपल्याला नीटशी कल्पना नाही. आपण त्या पतिव्रतेच्या पाणिदानाचा आग्रह धरल्यामुळं, त्या अनाथ गाईन कोणत्या देवाची करुणा भाकावी? मेवाडच्या परमेश्वरानंच तिची लाज राखावी, म्हणून आपली ही लाडकी लेक आपले पाय धरीत आहे. बाबा, राणीच्या पुनर्विवाहाचा आपला हट्ट सोडून द्या.
बनबीर०--नाही, ते आम्हाला नाही खपणार. आमच्या इच्छेला नकार? कृतांत काळाची छाती नाही. कमल परमारांच्या मोहिमेमुळे चितोड सोडून आम्हाला बाहेर जाव लागलं नसतं, तर रुपमतीच्या हेकेखोर नकाराला भीक न घालता, यापूर्वीच तिला मी तुझी आई बनवली असती. पण आता? रूपमतीची प्राप्ती, हा आमच्या ऐश्वर्याचा, सौख्याचा, छे, खास आमच्या मनस्वास्थ्याचा प्रश्न आहे आणि त्याला विलंबाची सबब सुद्धा आम्ही आता जुमानणार नाही.
कमल०--बाबा बाबा, आपल्या दिल्दार हृदयाला असा पोलादी कठोरपणा आणू नका. राजवैभवाच्या भरल्या ताटावरून उठलेल्या त्या अनाथ गरीब गाईला...
बनवीर०--सनाथ करून त्याच भरल्या ताटावर सन्मानानं बसवीत असता, मला विरोध? कमल, हा तुझा न् त्या राणीचा मूर्खपणा होत आहे. पण आजच तुला राणीबद्दल अितका उमाळा येण्याचं कारण काय?
कमल०--जोवर राणी रूपमति दुक्खात बुडालेली आहे. तोवर या कमलदेवीला सुखाचा लेशहि लाभणार नाही.
बनबीर०--खरं ना हे? खरं ना हे? माझी लाडकी कमल बेहद सुखात लोळावी, म्हणून राणी रूपमतीचं पाणिग्रहण करून, तिच्या सगळ्या दुक्खांचा आजच्या आज मी शेवट करणार.
कमल०--नाही, नाही, बाबा नाही. कमलच्या सुखाचा हा मार्ग नाही. रजपून वीरांगना आपल्या पातिव्रत्याला किती कडव्या कदरीनं जपतात आणि वेळच आली तर जोहाराची अग्निकाष्ठं सहज लीलेनं कशी गिळतात, याचा अितिहास, बाबा, नजरेआड करू नका.
बनबीर०--बस्स कर तुझं जोहार पुराण. हट्टी पोरी, भलभलत्या कुकल्पनांच्या भरी पडून, सर्वत्र चाललेल्या आनंदात विरजण घालू नकोस. तुला माझ्या मनस्वास्थ्याची काही चाड वाटत असेल, तर चल, आटप, पूस ते अश्रू. अश्रू उसासे अन् उमाळे, बनबिराच्या या दिग्विजयी रियासतीत, आजच्या आज, आत्ताच्या आत्ता, हद्दपार झाले पाहिजेत. (कमल अश्रू पुसते.) हां. शाबास, चल एकदा गोडशी हास पाहू (ती हसते.) शाबास उगाच नाही लोक म्हणत का आमची कमलदेवी गुणांची म्हणून अशी तुं हासऱ्या चेहऱ्यानी माझ्यापुढं आलीस का माझ्या पराक्रमांचं चैतन्य दुप्पट चौपट वाढतं. कमल, आता नुकतीच आलेली बातमी, उद्या सुर्योदयाबरोबर, साऱ्या मेवाडभर पसरताच, माझ्या किर्ति दुंदुभीचा दणदणाट गगनाला मिळेल. आनंदानं दाही दिशा कोंदाटून जातील.
कमल०--अशी कोणती आनंदाची बातमी ती बाबा? या कमलला नाही का ती सांगायची?
बनबीर०--तुला ती बातमी आधी सांगितली पाहिजे. पहिली बातमी आमची लाडकी राजकन्या कमलाराजा लवकरच परमार युवराज्ञी होणार. (कमल दूर होते.) मनाजोगतं असं काही झालं म्हंजे आपली पसंति कुमारिका अशाच गोड तिटकाऱ्यानं दाखवतात का? फिरली आमच्याकडे पाठ? लागला धारा नगरीचा ध्यास? (तिचा हात धरून जवळ आणतो.) पण इतक्यातच का आमचा हा तिटकारा. लग्न झाल्यावर विसरा वाटेल तर आम्हाला, आणि विसरणारच. आम्ही तो विचार गोड गोडच मानू. पण त्या गोष्टीची गोडीसुद्धा निगोड पाडणारी दुसरी बातमी. म्हणजे राणी रूपमति ज्या लौकिकी आक्षेपाच्या तंतूसाठी माझं पाणिग्रहण करायला बाचकत होती. त्या आक्षेपाचा विषय.... तरूण उदयसिंह...
कमल०-- (एकदम उमाळ्यानं) काय? चितोडला परत येणार
बनबीर०--माझ्या पटाइत मारेकऱ्यानी जगातून कायमचा नाहिसा केला.
(कमल किंकाळी मारून खाली पडते.)
बनबीर०--कमल कमल, झालं काय तुला एकदम असं? (तिला उठवतो.)
कमल०--(रडत) उदयसिंह उदयसिंह, तुमचं अंतःकरण किती हो उदार, दिल्दार न् सरदारी होतं.
बनबीर०--(स्व.) आस्सं. यात काहीतरी भानगड दिसते. (उ) कमल, माझ्या कट्ट्या दुस्मानाची ही बातमी ऐकून तुला जेवढा धक्का बसावा? दुक्खाला बेमान भरति यावी? काय याचं कारण? खरं सांग. बतावणी करशील, तर देखत हुकूम देशोधडीला जाशील.
कमल०--बनबीराच्या रागाचा झपाटा ही कमलदेवी चांगली जाणून आहे. पण प्राण गेल्यावर प्रेताला आगीचं भय कितीस असणार? खऱ्या गोष्टी मी आता कशाला छपवू? बिचारा उदयसिंह गेला.. गेला बाबा, तुमच्या न् जगाच्या रागालोभाच्या हद्दपार गेला. आता त्याला कुण्णा कुण्णाचं भय उरलं नाही. राजकुमार, या बेमाणुसकीच्या जगातनं झाली तुमची सुटका, पण आपल्या दिल्दारीनं साऱ्या जगाला हो लावलात चटका.
बनबीर०--उदयसिंहाची न् तुझी भेट झाली होती?
कमल०--सहा महिने झाले बाबा. विश्वेश्वराच्या दर्शनाला आपण मला काशीला पाठवलं, तिकडून परत येताना शेरशहाच्या एका लुटारू टोळीनं आमच्यावर हल्ला करून, राखणीचे सारे शिपायी ठार मारले आणि मला कैद करून रोठसच्या किल्ल्यात शेरशहाकडे नेले. बाबा. ही हकीकत आपण अितक्यातच नाही ना विसरलां?
बनबीर०--नाही आणि त्याचा नतिजा शेरशहाला कधि ना कधि दिल्याशिवाय मी खास राहणार नाही, पण त्या गोष्टीचा अिथं काय संबंध?
कमल०--त्या वेळी माझ्यावर गुदरलेल्या त्या प्रसंगाची, बाबा, आपल्याला करवेल तशी कल्पना करा. मुसलमानाच्या कैदेत हिन्दु तरुणी, म्हणे हा त्या चारगटानं हवी ती थट्टा करण्याची बेवारशी चीज. बन्दिवासाचे.. उघड्या हवेतले.. काटेरी पिंजऱ्यातले ते दिवस मी कसे काढले असतील, ते मला माहीत का या एकलिंगजीला माहीत. अशा वेळी एका तरुणाचं हिन्दु हृदय, माझी दुबळी स्थिति पाहून कळवळले. आ हा, शुक्राच्या चादणीप्रमाणं चमकणारे त्याचे ते सरदारी दयाळू डोळ...
बनबीर०--आणि तो तेजस्वी डोळ्याचा तरुण म्हणजे उदयसिंह, हेच ना तू मला सांगणार?
कमल०--होय बाबा, त्या नरकवासातन उदयसिंहानंच माझी सुटका केली. प्रथम त्याने शहाची पुष्कळ मनधरणी केली, विनवणी केली, पण खंडणीचा हट्टच जेव्हा तो घेऊन बसला, तेव्हा उदयसिंहानं आपल्याजवळ होत नव्हतं ते.... अंगावरल्या पोषाखासकट विकून टक्के केले, नि खंडणीचा ऐवज भरुन माझी सुटका केली.
बनबीर०--(स्व) आश्चर्यान हिनं मला चकित केलं.
कमल०--उपकारांच्या उमाळ्यानं आणि आनंदाच्या उसळीनं, बाबा, त्याच्या ईश्वरी पायाना मी आपल्या आसवांनी आंघोळ घातली. त्याच्याहि डोळ्यांतल्या आसवांनी माझ्या मस्तकावर अभिषेक केला.
बनबीर०--त्यानं नाही का तुझी विचारपूस केली?
कमल०--पणं मी जेव्हा माझं नाव बनवीर महाराजांची राजकन्या कमलदेवी असे सांगितलं, तेव्हा तो एकदम दचकला. त्याचा चेहरा पांढरा फटफटित पडला.
बनवीर०--तुझी सुटका केल्याबद्दल त्याला पश्चाताप झाला असेल.
कमल०--मुळींच नाही बाबा. चटकन भान सावरून तो मला म्हणाला, कमलदेवी, तू आता खुशाल चितोडला जा. तिथं माझी अनाथ माता आहे. तुला इथल्या बंदिवासाची काही कल्पना असेल, तर त्या मावलीची सावलीसारखी पाठराखणी कर. उदयसिंह तुझ्याशी ज्या माणुसकीन वागला, त्या भावनेनं तूं तिच्याशी वाग. असा तो श्रीमंत दिलाचा दिलदार सरकार. आणि असला उमदा मोहरा, देवा गौरीहरा, पोटभरू मारेकऱ्याच्या हातनं मारला जावा ना. (स्फुंदन करते).
बनबीर०--कमल, या मानगडीचा आजवर मला तू थांगसुद्धा लागू दिला नाहीस.
कमल०--बाबा, उपकारानी त्यानी माझं जीवनसर्वस्वच जिंकून घेतलं हो?
बनबीर०--माझा दुस्मान तुझं जीवनसर्वस्व जिंकणार?
कमल०--मरणीं मेलेल्या महाल्याबद्दल आता कशाला एवढा राग बाबा. आपला राजकारणी द्वेष सारखा हात धुवुन त्याच्या पाठीमागं लागला होता. म्हणून स्वताचं नांव बाहेर न फोडण्याबद्दल, त्यानं मला तुमच्याच हो रक्ताची शपथ घातली होती. त्याच्या मृत्यूबरोबरच, बाबा, तुमच्या द्वेषाची नाही का तुम्ही आता समाप्ती करणार?
बनबीर०--तुझ्या बापाच्या दुस्मानानं दिलेल्या स्वातंत्र्यांची तुला एवढी गोडी न् महति वाटते?
कमल०--पण बाबा, स्वप्नात तरी त्यानं तुमचा हेवादावा केला होता का हो?
बनबीर०--बेअिमान. बनबिरापुढं उदयसिंहाची तरफदारी? त्याच्या गुणांमुळेच तो
हरामखोर ठार झाला.
कमल०--राजाधिराज बनबिराच्या मुलीची अब्रु ज्यानं राखली, त्याचे असेच का आपण उतरायी होणार? राजकारणी हेवादावा कितीहि कडवा असला तरी, बाबा, सत्ताधाऱ्यांनी माणुसकीला अगदीच लाथाडून भागणार नाही.
बनबीर०--बापाच्या दिग्विजयी कीर्तीला काळिमा फासणारी कारटी बनबिरानं अजून जिवंत ठेवली आहे. याबदल तुझ्या दैवाचे तूं आभार मान, माझ्या दुश्मानाच्या
मेहरबानीनं जिवंत रहाण्यापेक्षा, शेरशहाच्या काटेरी पिंजऱ्यांत तू गुलाम राहिली
असतीस, तुझ्या अब्रुचे हवे ते बीभत्स धिंडवडे निघाले असते, निर्जन अरण्यात
लांडग्या कोल्ह्यानी तुझ्या शरिराचे लचके लचके तोडले असते, तरी देखिल मला इतकं वाईट वाटलं नसतं.
कमला०--बाबा देवाप्रमाणं तुम्हाला वंद्य मानून, माझ्या पितृभक्तीची मी कसोशी केली, त्याला अखेर हेच का फळ? कातड्याच्या प्रेमापेक्षा आतड्याची माया निराळीच म्हणतात, ते काही खोटं नाही कुठे तो दिल्दार उदयसिंह...
बनबीर०--(तलवार उपसून) माझ्या शत्रूचा नावाचा उच्चार? सफाचाट गर्दन छाटून टाकीन.
(गाभाऱ्यात उदयसिंह झिंदाबाद असा ध्वनि निघतो. बनबीर ३ वेळा अदयसिंह झिंदाबाद? असा प्रश्नार्थक सवाल टाकतो, त्याला तीनहि वेळा तोच जबाब मिळतो. )
बनबीर०--काय? हरामखोर देवसुद्धा माझ्या वैन्याचे साथीदार?
कमला०--बाबा, देवानं काय केलं? तुमच्याच शब्दांचा गाभाऱ्यात प्रतिध्वनि उमटला.
बनबीर०--पण प्रथम ध्वनि कुणी काढला? उदयसिंह झिंदाबाद? (तोच आवाज होतो) नाही नाही, बनबीर झिंदाबाद, आता कां नाही होत प्रतिध्वनि? हा एक लिंगेश्वरच राजद्रोही हरामखोर आहे. बस् ते काही नाही. आमच्या सत्तेविरुद्ध नुसता सुस्कारा टाकणाऱ्या दानव, मानव, देवांचा, क्षणाचाहि मुलाजा हा बनवीर राखणार नाही. कोण आहे जाबल्यावर? (एक सेवक येतो.) जा. एक घण घेऊन ये. (आज्ञा म्हणून तो जातो) बनबिराच्या सत्तेचा उपमर्द ? मानला तर देव, नाहीतर धोंडा. (सेवक घण आणून देतो ). (पिंडीला उद्देशून) बोल, काय उद्गार काढलास? (गाभान्यातून.-उदयसिंह झिंदाबाद) उदयसिंह झिंदाबाद? निमकहराम, हे घे बनवीरद्रोहाचं प्रायश्चित.
(पिंडीवर घण उभारून धावतो. कमल एकदम लगट करून त्याच्या हातून पण हिसकावून घेते.)
कमल०--बाबा, बाबा, काय करता हे ? बाप्पा प्राणप्रतिष्ठा केलेलं चितोडचं हे कुलदैवत.
बनबीर०--कुलदैवत. आमच्यासारख्या दिविजयी जेत्याना असल्या दगडी कुल दैवतांची पर्वा नाही. हा काळाचा काळ देवबीव कुछ जानता नहि. मेवाडचा परमेश्वर हा बनवीर. त्याची अिच्छा हीच रजपुतांची राजनीति. तिला विरोध करणारांची तमा आम्ही बाळगणार नाही. (सेवकाला हे अकलिंगेश्वाराच देवूळ आता आजच्या रात्री जमिनदोस्त करा. उद्या सकाळी सूर्यानं पूर्व क्षितिजावर आपलं डोकं वर काढताच, या ठिकाणी गाढवांचे नांगर फिरताना त्याला दिसले पाहिजेत. (सेवक जातो) कमल, जा. यापुढं राणी रूपमतीच्या मुलाखतीची तुला सक्त मनाअ करण्यात येत आहे. चल, जा चालती हो.
(कमल जाते आणि कर्णपाल येतो.)
कर्ण०--आनदाची बातमी, सरकार, आनंदाची बातमी.
बनबीर०-- काय जयपाळानं रुपमतीची संमति मिळवली?
कर्ण०--त्या राणीला राहू या तशीच जळफळत. उदयसिंहाला ठार मारणारा
आपला तरूण मर्द मारेकरी हुजूरच्या दर्शनाला आला आहे.
बनबीर०-- कोण? आपला जेठी प्राणमल्ल?
कर्ण०--प्राणमल्लाचा प्राण उदयसिंहानंच घेतला. पण त्याच्या बरोबर असणाऱ्या या मर्द केदारनाथानं उदयसिंहाला स्वता ठार मारून, सरकारच्या पायांची बिनमोल सेवा बजावली आहे.
बनबीर०--शाबास त्या मर्दाची. त्याच्यापाशी आमची खुणेची राजमुद्रिका आहे ना?
कर्ण०--अलबत. ती घेऊनच महाराजांची खात्री पटवण्यासाठी आज्ञेची वाट पहात तो बाहेर उभा आहे.
बनबीर०--जा. आत्ताच त्याला आमच्या समोर घेऊन ये (कर्ण, जातो) (स्व.) या बातमीनं तर माझ्या मनोरथाची भिंगरी आशेच्या अंतराळात पार भिरकावून दिली. हा केदारनाथ खुणेची राजमुद्रिका घेऊन आला असेल, तर उदयसिंहाच्या अवतारसमाप्तीची शंकाच उरणार नाही.
(केदारला घेऊन कर्णपाल येतो.)
कर्ण०--सरकार, हा पहा तो मर्द केदारनाथ.
केदार०--महाराजाधिराज बनबीर महाराजांचा जयजयकार असो. सरकारच्या पायांच्या पुण्याईन उदयसिंहाला ठार मारण्यात यशवंत झालेल्या या केदारनाथ सेवकावर खावंदाची मेहरनजर असावी. (आगंठी दाखवून) ही सांकेतिक खूण माझ्या सेवेची बिनतोड साक्ष देईल.
(कर्णपाल आगंठी घेऊन ती बनबिराला देतो)
बनबीर०--(आगंठी तपासून) खात्री पटली. शूर केदार, तुझ्या कामगिरीविषयी आमची बालंबाल खात्री पटली, प्राणमल्ल जेठीचा मदतगार दोस्त तूंच ना?
केदार०--हां हुजूर शत्रुच्या रक्ताचा टिळा महाराजांच्या कपाळी जाऊन लाव, अशी प्राणमल्लाची शेवटची इच्छा. ती मला अक्षरश: जरी पार पाडता आली नाही, तरी उदयसिंहाच्या रक्तानं माखलेला हा खंजिर तरी महाराजांनी आपल्या भालस्पर्शानं धन्य करावा. (खंजीर देतो.)
बनबीर०--(खंजिराला लागलेले रक्त पहात.) केदार या खंजिरानं राजकुमाराच्या काळजाचा ठाव फार सफाईत घेतलेला दिसतो. या टिचभर पात्यानं त्याच्या साऱ्या धाडशी महत्त्वाकांक्षा चुटकीसरशा हवेत फुंकून, आमच्या दिग्विजयाचा राजरस्ता सताड मोकळा केला, आ हा. एकवार त्या भिकारड्या पण धाडशी पोराच्या छातीत बनबीरद्वेषानं उसळणार ताजं तापट, रक्त या तिखट पात्यावर माखून, आज माझ्या हातात आलं आहे. याला कसलंहि चैतन्य नसलं, तरी माझ्या पराक्रमाच्या भरारीचचं चैतन्य, रक्तलेपानं बेहद्द फुरफुरलं आहे. याला वाचा नसली तरी अशाही निर्वाच्य स्थितीत. बनबीराच्या भावी उत्कर्षाची गीता, हे रक्त मुक्त कंठानं गात आहे. (रक्ताचा वास घेत) आ हा हा, आपल्या कट्ट्या दुस्मानाच्या रक्ताचा अस्सा वास घेण्याचं भाग्य फारच थोड्या नरपतींच्या नशिबी लिहिलं असेल. जगातल्या सान्या सुगंधाचा अर्कसुद्धा याच्या पासंगाला पुरणार नाही.
केदार०-- खावंद, बेअदबी माफ. आपल्या सारख्या दिग्विजयी नृपतीनं हिऱ्यामोत्यांची राजचिन्हं छातीवर लटकावण्यापेक्षा, आपल्या दुस्मानाच्या रक्तानं माखलेले खंजीर, माळ करून, वैजयंतीप्रमाणं गळ्यात धारण केले पाहिजेत. देवाधिदेव महादेव नरखंड मालघर म्हणून मिरवण्यातच धन्यता मानतात.
कर्ण०--श्रीशंकर तर नुसता नररुंड-मालघर, पण आपले राजाधिराज प्रत्यक्ष नृपरुंड- मालघर.
केदार०--यात काय संशय, परमेश्वरी अवताराशिवाय पराक्रमांचा घौशा असा हुकमी विजयी होत नसतो. महाराज, आपल्या मेहरबानीची एकाग्र नजर किंचित त्या पाल्यावर फिरवावी म्हणजे सरकारच्या भावी चरित्राचा चित्रपट त्यावर स्पष्ट उमटलेला दिसेल.
बनबीर०--(पात्यावर तीक्ष्ण नजर रोखून) खरंच केदार, कर्णपाल या रक्तलांछित खंजिराच्या पात्यावर आमच्या सर्व महत्त्वाकांक्षा जिवंत हालचाल करताना दिसताहेत. हा पहा, हा काळाचा काळ बनबीर, केवळ मेवाडच्याच नव्हे, तर साऱ्या हिंदुस्थानचा बादशहा म्हणून कौरव पांडवांच्या हस्तिनापूरच्या प्राचीन सिहासनावर चढत आहे. पादाक्रांत झालेले हुमायून, शेरशहा, आमचा रत्नजडीत भरजरी झगा उचलून, आदबीनं आमच्या मागं चालत आहेत. काबूल कंदाहार न् कुन्स्तुन्तुनियाच्या सुलतानांचे एक वेळ मगरूर असलेले प्रतिनिधी, हातात करभार घेऊन, आम्हाला खडीताजीम देण्यासाठी दरबारात खाली माना वाकवून उभे आहेत. ही पहा, एका तोफांची सरबत्ति झाली. मंगलवाद्यांचा घणघणाट चालू झाला. आम्ही आता बादशाही सिंहासनावर चढणार. पण आम्ही एकटेच सिंहासनावर? काय म्हणून? कर्णपाल, आमची राणी.... नव्हे महाराणी.... सौन्दर्यसम्राज्ञी रूपमति यात कां दिसत नाही? कुठं आहे रूपमती? रूपमती. बस्स रूपमती.
कर्णo--सरकार, हा उद्याचा चित्रपट आहे, आजचा नाही हस्तिनापूर हस्तगत करण्यापूर्वी रूपमतीचा हस्त हुजूरना हस्तांकित केलाच पाहिजे.
बनबीर०--रास्त आहे तुझं म्हणणं कर्णपाल (केदारला खंजीर परत देतो.) इमानी केदार, आज तूं न् तुझ्या खंजिरानं बजावलेली चोख कामगिरी आम्ही फार फार वाखाणतो. आता आणखी एक तितक्याच महत्वाची, पण नाजूक कामगिरी तुझ्या सुपूर्द करण्याची आमची मेहरबानी होत आहे.
केदार०--बंदा हुकमाचा ताबेदार आहे.
बनबीर०--आत्ताच्या आत्ता जाऊन राणी रूपमतीची भेट घे. लक्षात असू दे, उदयसिंहाच्या मृत्यूची बातमी तिला लागली असून, खुनाच्या वहिमाची कडवी नजर तिनं आमच्यावर रोखून धरली आहे. केदार, तिच्याकडे तूं जा. राजकुमाराला मरताना तूं प्रत्यक्ष पाहिलंस, अशी तिची खात्री पटव. आणि प्राणांतिच्या भयंकर यातनांनी तो तडफडत असताना, त्यानं आपल्या आईला शेवटची अशी अिच्छा, तुझ्याजवळ सांगितल्याचं तिला खुलवून सांग, किं माझ्या आजीनं राजाधिराज बनबिराचं शास्त्रोक्त पाणिग्रहण करून, देशात शांतता प्रस्थापित करावी. या युक्तीनं आमच्याविषयी राणीचा सर्व गैरसमज दूर होऊन, आमच्या अिच्छेला ती खास मान देईल.
केदार०--वाहवा, युक्ति तर मोठी छान निघाली.
कर्ण०-- अवतारी महात्म्यांची लीला काय सांगावी.
(जयपाळ येतो.)
बनबीर०--ओहो जयपाळ, अगदी वेळेवर आलास. या तरुण मर्दाला तूं ओळखतोस काय ?
जयपाळ०--(केंदारला निरखून) नाही सरकार. मी याला कधीच पाहिलेला नाही. हा चितोडकर नसावा, परदेशी असावा.
बनबीर०--या अनोळखी परदेशी केदारनं आपल्या साम्राज्याची एक अतिशय महत्वाची कामगिरी बजावली आहे. जयपाळ, आत्ताच्या आत्ता तू याला घेऊन राणीकड जा. मरण पावलेल्या राजकुमाराची शेवटची अिच्छा हा तिला स्वतः सांगणार आहे. ती अकल्यावर राणीच्या मनात आमच्याविषयी प्रेम उत्पन्न होईल, अशी आम्हाला बळकट आशा आहे (कर्णपालास) कर्णपाल, चल तिकडं मेजवानी अगदी थाटून राहिली असेल. चल. आता उशीर नको. चमकदार मद्याच्या पेल्यात आमच्या विजयोत्सवाचा आनंद मूर्तिमंत चमकला पाहिजे आणि आज रात्रीच्या रोषनाईनं प्रत्यक्ष सूर्याचा गर्व पार उतरला पाहिजे.
(बनबीर आणि कर्णपाल जातात.)
केदार०--काय मेहरबान राजवाड्यात थाटलेली मेजवानीची चंगल नि अर्कप्राशनाची
चंगळ उडवायला, नाही का तुमची लहर लागत?..... काय हो, उत्तर देत
नाही? मुद्रेवरून तुमच्या डोक्यात कसल्या तरी चमत्कारीक विचारांचं समुद्रमंथन चाललेलं दिसतंय.
जय०--समुद्रमंथन तर खरंच. पण कसल्या गुप्त धोरणानं तुझी या ठिकाणी रवानगी झाली आहे, हे तरी सांगण्याची तू मेहरबानी करशील का?
केदार०--हो, हो, न सांगायला काय झालं? माझा धंदा पिढीजात मारेकल्याचा. आमच्या डोळ्यांवर सदा न् कदा खून चढलेला. हवा त्याचा, हवा तिथं, हवा तसा खून पाडणं, हाच आमचा मूळधर्म. श्वासोच्छास करणं, ही जशी माणसाची सहज क्रिया, तसे खून पाडणं ही आमची सहज लिला. माझ्या भेसूर उग्र चेहऱ्या वरून नि पोषाखावरून. उदयसिंहाचा खून करणारा तो मीच, हे तुला समजायला हवं होतं.
जय०--काय? उदयसिंहाचा खून करणारा?
केदार०--का? तुला आश्चर्यसं वाटलं? राजघराण्यातला रक्ताशिवाय, दुसऱ्या
कोणत्याही रक्ताची चटक या माझ्या खंजिराला नाही. यात आश्चर्य कसलं?
जय०--आश्चर्य कसलं म्हणा. होतंय ते ठीकच होतयं. तो खरोखरच बनबिराचा शत्रू होता.
केदार०-- बनबिराचा शत्रू म्हणूनच मेवाडचा हाडवैरी न् चितोडचा चाण्डाळ नव्हे का?... का?... एकदम तुझी वृत्ति अशी बावरली? खवळली? उसळली?
जयपाळ०-- आग लागो या माझ्या जीविताला नि दुर्भाग्याला. नाही नाही.... नाही माझ्या हात् नं आता असली छपवाछपवी होणार. राजकुमाराच्या रक्तानं माखलेला खुनी बदमाष या माझ्यां डोळ्यांना पहावतो तरी कसा? बस... बस झाला हा मनाचा कोंडमारा न् खोट्या राजनिष्ठेचा मुखवटा. जा. आत्ताच्या आत्त त्या जुलमी हरामखोर बदनाम बनविराला जाऊन सांग, जयपाळ तुझ्या सत्तेचा मुलाजा मुळीच मानीत नाही. अदयसिंहाच्या रक्तानं माखलेल्या या तुझ्या हाताची सुद्धा मी दिक्कत बाळगीत नाही. जा. त्या अत्याचारी सैतानाला जाऊन सांग, राक्षसा, माझाहि प्राण घे. गळा कापून घे, कातडी सोलून घे, हवा तसा घे बनबीर राक्षसाचा सत्यानाश सत्यानाश....... सत्यानाश, अशा आरोळ्या ठोकीत, मरणाला मिठी मारायला हा जयपाळ तयार आहे.
केदार०--अरे वा, तुझी बरीच तयारी दिसते. उदयसिंहावर तुझं प्रेम होतंस दिसतं.
जय०--त्याच्यावर कुणाचं प्रेम नसेल. चितोडगडावरचा धुळीचा कण न् कण त्या सद्गुणी राजपुत्राच्या प्रेमानं भारलेला आहे. हाय हाय, त्याचा स्वभाव इतका उमदा न् दिलदार, त्याचं चारित्र्य इतक उज्ज्वल न् प्रवित्र, का प्रत्यक्ष जहरी द्वेषाची नांगीसुद्धा बोथट पडावी आणि त्याच्या धवल कीर्तीवर शिंतोडा उडवताना, जगातल्या सैतानी वृत्तीची सुद्धा मान मुरगळून पडावी. असला चितोडचा मोहरा, रजपुतांचा राजा. तुझ्यासारख्या पोटभरू मारेकऱ्याच्या शस्त्राला बळी पडावा. त्यापेक्षा आता मरण काय वाईट? ज्याच्यासाठी जगायचं, तोच मरणीं मेल्यावर, धरणीला या अभाग्याचा भार कशाला? त्या पाषाणहृदयी राक्षसाचा तूं इनामी सेवक. मी पण उदयसिंहाइतकाच त्या राजकुमाराच्या छातीत घुसलेल्या या तुझ्या काळशस्त्रानं, ही माझी बनबीरद्रोही छाती फाडून टाक. टाक... टाक...एका झटक्यात आटपून टाक. (त्याच्या कंबरेच्या खंजिरासाठी लगट करतो.)
केदार०--( त्याला आवरून) राजकुमारावरच्या तुझ्या प्रेमाची न् निष्ठेची मी मोकळ्या मनानं तारीफ करतो आणि माझ्या या खंजीराचीच शपथ घेऊन सांगतो, का मी या बनबीराला सपशेल फसवला आहे. उदयसिंह अजून जिवंत आहे.
जय०--अदयसिंह अजून जिवंत आहे?
केदार०--इतकं नव्हे तर या घटकेला तो चितोडगडावर आहे.
जयपाळ०--अशक्य. साफ खोटी गोष्ट. माझ्याशी तरी लफंगेगिरी करू नकोस.
केदार०--तुला विश्वास वाटत नसेल, तर त्याला आत्ताच्या आत्ता तुझ्यापुढं आणून उभा करतो.
जय०--पाया पडतो. बाबा तुझ्या पाया पडतो. एवढा तरी अत्याचार करू नकोस. या वाघाच्या जबड्यात त्या बिचाऱ्या कोकराचं बलिदान करू नकोस.
केदार०--अरे, इतका कशाला घाबरतोस. मी त्याला अितक्या गुप्त वेषानं अिथं घेऊन येतो का, अिंतरांची गोष्टच सोड, पण तूं सुद्धा त्याला ओळखू शकणार नाहीस.
जयपाल०--काय? मी सुद्धा त्याला ओळखणार नाही? तुझा आत्मविश्वास फार
दांडगा दिसतो.
केदार०--अलबत. किती वर्ष तूं पाहिला नाहीस त्याला?
जयपाळ०--जवळजवळ सहा वर्ष झाली त्या पन्ना मावलीनं आपला बारा वर्षाचा कोवळा पोटचा गोळा संग्रामसिंह या हरामखोर बनबिराच्या कट्यारीला बळी देऊन, राजकुमार उदयसिंहाचा प्राण वाचवला आणि त्याला हातोहात चितोडहून पळवला. त्या काळघटकेपासून आतापर्यन्त या अभाग्याला राजकुमाराचं मुळीच दर्शन नाही.
केदार०--खरं ना? मग या सहा वर्षाच्या हद्दपारीत त्याच्या वाढत्या तारुण्याच्या आवाजात न् चेहऱ्यात खात्रीनं अितका फरक पडला असेल, का तो तुझ्यासमोर येउन ऊभा राहिला तरी त्याला ओळखायला तुझी नजर खास चकलीच पाहिजे.
जय०--केदारनाथ, या गोष्टी कितीहि खऱ्या असल्या तरी अस्सल राजतेजानं चमकणारा त्याचा उमदा चेहरा आणि पाणीदार डोळे, यांची आमची आठवण कालान्तरानेहि बुजणारी नाही. शिवाय एक खूण तरी अशी आहे की ती पहातांच, चितोडचा हरएक मनुष्य त्याला हटकून ओळखल्याशिवाय रहाणार नाही.
केदार०--आस्सं? अशी कोणती ती खुण?
जय०--राजकुमार दहा अकरा वर्षाचा असताना, अजायबखान्यातल्या एका क्रूर चित्त्याने त्याच्या आईच्या... राणी रूपमतीच्या अंगावर झाप टाकली. त्यावेळी राजकुमारनं कट्यारीच्या एकाच वारात चित्त्याला ठार केला. त्या झटापटीत चित्त्याने उदयसिंहाच्या कपाळावर पंजाची एक चपराक मारली. त्याची खोक...
केदार०--काय खोक?
जय०--भालचंद्रासारखी ती सुन्दर खोक कधीहि नाहिशी होणार नाही.
केदार०--( शिरस्त्राण बाजूला सारून) पहा बरं. ती अशीच होतीच का.
जय०--(चपापून) मी कुणाला पहात आहे? स्वप्नात तर मी नाही ना? राजकुमार उदयसिंह? माझे पूज्य महाराज? (गुडघे टेकून प्रणाम करतो.) महाराज, हे काय गौडबंगाल? केदारनाथ मारेकरी हाच राणा उदयसिंह?
केदार०--यात काय संशय, अिमानी जयपाळ, उठ उठ तुझ्या एकनिष्ठेची फेड मला अश्शी करू दे. (त्याला कडकडून भेटतो.)
जयपाळ०--महाराज, आजचा दिवस धन्य, आपले दर्शन झाले. पण महाराज...
उदय (केदार)०-- का? एवढा कापतोस का? माझा हात घट्ट का धरतोस? तुला माझा संशय येतो का?
जय०--मुळीच नाही महाराज आमच्या थोरल्या महाराजांचा हा हुबेहूब तोंडवळा पाहून कोण शंका घेईल? पण बनबिरानं मुदाम पाठविलेल्या त्या मारेकऱ्याच्या तडाक्यातूनं महाराजाची कशी सुटका झाली?
उदय०--प्राणमल्लानं माझ्यावर झाप तर मोठी सफाअत टाकली. पण चपळाई करून मी हा खंजीर त्याच्या हातून तितक्याच चपळाईन हिसकावून घेतला न् डोळ्याचं पातं लवतं न् लवतं तोंच त्याच्या छातीत बिनचूक खुपसला.
जय०--असल्या प्रसंगावधानी चपळाईबद्दल महाराजाची ख्यातीच आहे.
उदय०--त्याच्या बोटात बनबिराची ही अंगठी होती. प्राण सोडताना तो मला म्हणाला, पापाचं प्रायश्चित्त मला चांगलंच मिळालं. त्याचं थोडंतरी पालन व्हावं म्हणून ही घे अंगठी. बनबिराला ही तूं दाखविलीस म्हंजे तुझ्या मृत्यूबद्दल त्याची खात्री पटेल आणि साऱ्या मेवाडभर आणि खुद्द चितोडगडावर सुद्धा तुला बिनधोक बिनसशय उघड्या माथ्यानं वावरता येईल. अितकं बोलून प्राणमल्लानं प्राण सोडला.
जय०--पण या काळ्या कभिन्न वेषानं, राजवाड्यात आपला प्रवेश कसा झाला?
उदय०--कसा म्हंजे? उदयसिंहाचा खून करणारा तो मीच, या बतावणीनं, शिवजय ही खुणेची आंगठी न् बनबिराचं नाव खोदलेला हा खंजीर, प्रत्येकाची तशीच बिनचूक खात्री पटवीत आहे.
जय०--आपण अिथं येण्यापूर्वी आपल्या मृत्यूची बातमी सगळीकडं फैलावली होती.
उदय०-- ती कंडी मीच पिकवली होती, लोकांचं काय? जरा कुठं कुणी काही हूल उठवली का तिचा प्रतिध्वनि तेव्हाच सगळ्यांच्या जिभांवर नाचू लागायचा. खऱ्या तोट्याची पारख करतो कोण?. . . जयपाल, वेषांतराचं हे नाटक आतापर्यंत तरी बेमालून बिनबोभाट ठीक वठलं . . . . पण माझ्या आईची काय अवस्था आहे? तिची आठवण झाली का माझा विवेक पांगळा पडून, सारा देह थरथर कापू लागतो. तिची जातिवंत रजपुती तडफ अजून आपल्या सत्याला नाही ना पारखी झाली?
जय०-- नाही. रतिमात्र नाही. खुनाच्या धमक्यांचा न् जबरीच्या दहशतींचा, त्या राक्षसाने त्यांच्यावर सारखा मारा चालू ठेवला आहे. तरीसुद्धा मासाहेब मेरुपर्वतासारख्या अचळ न् अभेद्य आहेत.
उदय०-- या कामी, परमेश्वरा, तू माझ्या मातृदेवतेचा पाठीराखा हो आणि तिच्या दुक्खाची समाप्ती करण्याची मला शक्ति युक्ति दे.... बरं जयपाळ, मासाहेबांची न् माझी भेट तूं केव्हा करतोस? चल, मला त्यांची आत्ताच भेट घेतली पाहिजे.
जय०--महाराज, आपल्या दर्शनाने मला कितीहि आनंद होत असला, तरी आपण या ठिकाणी--या वाघाच्या जबडयात पाऊल ठेवल्यापासून... काय असंल ते असो.... माझ्या मनात भलतीच भीति उत्पन्न झाली आहे.
उदय०--भीति? चोर गुन्हेगारानी भीति बाळगावी. निष्कलंक मनोवृत्तीला भीतीची काय पर्वा? आपण काय कुणाचा घातपात केलाय, तर भीतीच्या गोष्टी बोलतोस?
जय०--पण.... बनबिराची शंकेखोर वृत्ति....
उदय०--त्याची नको तुला काळजी. त्याच्याच खास हुकमाने मासाहेबांकड मी जाणार आहे, हे तूं अितक्यातच विसरलास ? हे पहा, हा मारेकऱ्याचा पोषाक, ही राजमुद्रिका आणि हा खंजीर या माझ्या वेषात मला ओळखण्याची कुणाचीहि छाती नाही.
जय०--आपण काहीहि म्हणा, नसत्या कल्पानानी माझं मन बेताल होत आहे. (पाय धरून) महाराज. कृपा करा न् शक्य तितक्या लवकर आपण चितोड सोडून जा.
उदय०-- प्रतिज्ञेला पाठ दाखवून पळून जाऊ? काय, काय म्हणतोस जयपाळ? सिंहाचा छावा खवळल्यावर, मत्त हत्तीचं गण्डस्थळ फोडल्याशिवाय तो कसा राहील? माझ्या ठरलेल्या निश्चयाच्या झंजावाताचा सोसाटा, या जुलमी राजाचं सिंहासन आजच्या आज उखडून जमीनदोस्त करील.
जय०--म्हणजे? महाराज, आपल्या मनात आहे तरी काय?
उदय०--माझ्या बाबांच्या रक्ताचा सूड, पन्नादाइच्या खुनाचा सूड, संग्रामसिंहाच्या बलिदानाचा सूड आणि अखेर.... अखेर माझ्या मातेच्या छळाचा सूड.
जय०--महाराज, आपण एकटे ना कुणाचा पाठिंबा, ना मदत. किती लोकांशी तोंड द्यायचं आहे, याची महाराजांना काही कल्पना आहे काय ?
उदय०--म्हणूनच हा खुनी बदमाषाचा पेहराव. जयपाळ, तुझ्या भीतिग्रस्त मनाची पर्वा करणचं मला काहीच कारण नाही. पण लक्षात ठेव, उद्याचा सुर्य अउदयाचलावर येण्याच्या पूर्वीच, त्या पापधन बनबिराच्या रक्तानं या खंजिराची तहान भागलेली तुला दिसेल.
जय०--महारुद्र महादेवा, माझ्या धन्यावर तुझ्या कृपेची पाखर घाल. पण महाराज, सूडाची अशी घोर प्रतिज्ञा करण्यापूर्वी,आपण पुरता विचार केला आहे ना?
उदय०--जयपाळ, विचारात आता किती काळ घालवणार? या हतभागी राजकुमारानं तब्बल बारावर्ष रानावनात कदन्न खावून काढले, तरीहि तुमच्या विचारांत अजून कमकुवतपणाच? तुम्हा रजपुताना खरोखरच काही विचार असतां, तर हा जुलमी नराधम चितोडच्या छातीवर चढलाच असता कशाला ?... पण जयपाळ, तूं घाबरु नकोस, भेदरु नकोस. मी अिथं येण्यापूर्वी आपले खारे अिमानी दोस्त, हमीर, कृष्णदेव, मालवराय.....
जय०--हमीर मला नुकताच देवळात भेटला.
उदय०--या सगळ्यांच्या हिमतीवरच मी आपल्या प्रतिज्ञेचा पाया उभारला आहे.
जय०--चितोडच्या स्वातंत्र्याची आशा करण्याअितकी तयारी झाली आहे म्हणायची. तरी म्हटलं, हमीर असा अवचित गडावर कसा आला. महाराज, सांगा सांगा, कशी काय तयारी झाली आहे ती.
उदय०--जयपाळ, परिस्थितीनं चितोडल गुलामगिरीत कितीहि भरडून काढलं, तरी स्वातंत्र्याच्या रजपुती आकांक्षा कधीहि मरणाऱ्या नव्हत. मेवाडाभिमानी निवडक नागरिकांची एक मजबूत टोळी, दक्षिण बुरूज सुरुंगानं अडवून आज गडावर घुसणार. आजच्या मेजवानीच्या चमचमीत खाद्यावर आणि भरंसाट मद्यावर यथेच्छ ताव मारून निशाबाजीत बेहोष तर्रर झालेल्या बनबिराच्या पोटभरू सैनिकांची सर्रहा कत्तल करणार आणि मेवाडच्या पायात खळखळणाऱ्या बनबिरी सत्तेच्या शृंखला आजच्या आज तोडणार, अशी बेलभंडार उचलून सर्वांनी शपथ घेतली आहे. आणि लवकरच उसळणाऱ्या त्या हलकल्लोळात, बनबिराच्या भडकत्या क्रोधापासून मासाहेबांचं रक्षण करीत, मी अिथंच आसपास रहाणार.
जय०--चितोडच्या कुलदेवता आपले मनोरथ पूर्ण करीत पुण्यश्लोक बाप्पा,रावळची पुण्यायी आपल्या निर्धाराना यशवंत करो. चितोडचा उद्धार होवो.
उदय०--तथास्तु, जयपाळ, तुझ्या उत्साहि वाणीनं माझ्या सूडाच्या प्रतिज्ञेला दुप्पट चैतन्य आलं. तुमच्या सारख्या अिमानी दोस्ताचं पाठबळ असल्यावर हा उदयसिंह कळिकाळाला दाद देणार नाही. अितकंच काय, पण आजची रात्र संपण्यापूर्वीच चितोडची राष्ट्रदेवता, या बनवीर महिषासुराचं मंथन करून, विजयादशमीचं स्वातंत्रसोनं साऱ्या मेवाडभर उधळून तुमचा जयजयकार करील.
अंक दुसरा समाप्त.
अंक ३ रा
प्रवेश १ ला
(कमलदेवी आणि उदयसिंह अचानक समोरासमोर येतात. उदयसिंह चट्कन मागे परततो. कमलदेवी आश्चर्याने त्याच्या वाटेकडे पहात उभी रहाते.)
कमल०-- कोण ते? बोलत कां नाही? काय बाई चमत्कार तरी. अलिकडं असली अनोळखी माणसं काय म्हणून अिकडं घिरट्या घालीत असतात?
उदय०--(स्व.) अनोळखी शब्दानं बाजू राखली.
कमल०--अनोळखीपणाचं पांघरूण पांघरलं, तरी ओळख नाही बरं लपणार. कोण आहे ते? जबाब येतोय का मारू जाबत्याला हाक?
उदय०--( नाइलाजाने पुढे येत.) अरेरे, घात झाला अखेर.
कमल०--कमलदेवीच्या हातून घात? कधीच होणार नाही. उदयसिंह जिवंतअसेल, तर कमलदेवीचा आनंद अस्मान ठेंगणं करील.
उदय०--दगाबाजी, खास माझ्याशी कुणीतरी दगाबाजी करीत आहे.
कमल०--दगाबाजी? कमलदेवीच्या हातून दगाबाजी? प्राण गेला तरी होणार नाही.
उदय०--अहो बाई, भलत्याच अनोळखी माणसाशी इतकी सलगी करणं शोभत नाही तुम्हाला.
कमल०--कशाला हवी आता ही छपवाछपवी? शेरशहाच्या बन्दीतनं सुटका करून, जिला आपण जीवदान न् अब्रूदान दिलंत, ती ही कमलदेवी, आपल्या जिवासाठी हवं ते दिव्य करायला तयार आहे.
उदय०--कमलदेवी. चितोडवरच्या हजारो लोकाना मी भुरळ पाडली. पण तुझ्या चतुरायीनं त्या भुरळीचं धुकं पार उधळून लावलं, माझा घात झाला.
कमल०--कमल जिवंत असेपयन्त घात? महाराज, अशी शंका तरी तुम्हाला कशी येते? अितरानी आपल्याला ओळखलं नसेल नि ओळखणारहि नाहीत. पण दिव्य प्रेमाच्या शोधनप्रकाशात, महाराज, मी आपल्याला ओळखल्याशिवाय कशी राहीन? माझ्या अब्रूसाठी आपल्या सर्वस्वाचंहि बलिदान करणाऱ्या महाभागाला ही कमलदेवी कशी बरं विसरेल?
उदय०--राजकन्ये, तुझ्या मनाचा मोठेपणा न् हृदयाची श्रीमंती, या मृत्युलोकावर स्वर्गाच्या ऐश्वर्यांची दिव्य साक्ष पटवीत आहे. शेकडो संकटाना नि हालअपेष्ठांना पोलादी निश्चयानं भरडीत चुरडीत येथवर मी आलो. पण आज तुझ्या चारुशीलापुढं मी हात टेकले. कष्टांच्या कठोर आघातानी छिन्नभिन्न झालेलं माझं हृदय, तुझ्या चांगुलपणाच्या वसंतानं कल्पनातीत फुलवून, आज पल्लवित केलं. स्त्रियांच्या हृदयाची माधुरी न् मार्दव, या दुर्देवी उदयसिंहान आजवर अनेक वेळा अनुभवलेलं आहे. पण परिस्थिति..... हो परिस्थितीच. या अवदसेनं जन्मापासून माझा सारखा पाठलाग केल्यामुळे, त्या दिव्य भावनांचा घोट ओठाआड होण्यापूर्वीच, माझ्या सुखाचे अनेक प्याले खडतर देवानं लाथाडून फोडलेले आहेत.
कमल०--खरं ना हे? मग महाराज, या काळाच्या गुहेत पाऊल ठेवण्याचं धाडस आपण कशाला बरं केलंत? महाराज, माझ्याविषयी आपल्याला थोडा तरी कळवळा वाटंत असेल, तर आत्ताच्या आत्ता हा चितोडगड सोडून आपण निघून जा. हात जोडते,पदर पसरते, पाया पडते. अिथं क्षणभरसुद्धा राहू नका गडे. आपण शीर सलामत जिवंत आहात, ही आनंदाची बातमी राणीसाहेबाना सांगून, त्यांच्या दुःखाचा भार हलका करण्याची कामगिरी मी पार पाडते. त्याची मुळीच काळजी करू नका.
उदय०--मी पुन्हा वनवासात जाऊ म्हणतेस?
कमल०--आपण परदेशी सुखानं रहाण्यातच या कमलदेवीच्या सुखाचा पाया आहे. आपल्या बऱ्यावाईट भाग्यात सारं जिणं समरस करून बसलेल्या या कमलच्या प्रार्थनेचा नका गडे आता अव्हेर करू. प्रत्येक क्षणाला, महाराज, काळाचा काळपाश आपल्या मानेभोवती घट्टघट्ट आवळला जात आहे. याची जाणीव ठेवा. चला. आता क्षणभरसुद्धा अिथं राह्यचं नाही गडे, मी आपली ना?
उदय०--कमल, मी तरी माझा राहिलो आहे काय? या अफाट पृथ्वीवर माझं असं म्हणण्यासारखं काय राहिले आहे?
कमल०--महाराज, आपल्या पाठोपाठ वनवासी म्हणून हवं तिथं अनवाणी भटकायला ही कमलदेवी तयार आहे. पण अचानक काळपाशात सापडून, आपल्या उमलत्या जिवाचं बरं वाईट झालेलं, नाही गडे मला पहावणार.
उदय०--कमल, तुझ्या विचारांची श्रीमंती कुबेराच्या ऐश्वर्याचाहि गर्वभार उतरील अितकी गोड न् थोर आहे.
कमल०--आता बोलण्यात वेळ घालवू नका. एकेक क्षण आपल्या सोनेमोल आयुष्याची काळनजरेनं मोजदाद करीत आहे. माझ्यावर कृपा करा. वाटेल तर, माझ्या प्रेमाचा धि:कार करा, मला साफ विसरून जा.....
उदय०--तुझ्या प्रेमाशी प्रतारणा? वीज कडाडून मस्तकाचे कोळशे होवोत.
कमल०--आता वेळ घालवू नका म्हणते ना? आपल्या रक्तासाठी तान्हेलेला वाघ सावध झाला नाही तोंच त्याची गुहा सोडून निघून जा लवकर.
उदय०-- अिथनं लवकर निघून जाव.... असं मलासुद्धा वाटत... प.... ण....
कमल०--पण? चटकन निघून जायला अडचण कसली?
उदय--अडचण माझ्या दैवाची, दैव आड आलं नाही, तर मला न्याय मिळालाच पाहिजे. कमल, प्रत्यक्ष कृतान्त काळ कोपला, तरी माझ्या पित्याच्या खुनाचा सूड उगवल्याशिवाय मी राहणार नाही. संकटाना भिवून मी आपला पाय मागं घेऊ? शक्य नाही ते आता. खुनाचा सूड घेतला नाही, तर माझे स्वर्गवासी बाबा मला शाप देतील.
कमल०--काय म्हटलं आपण? बापाच्या खुनाचा सूड? हो, महाराज, लक्षात असू द्या. मलाहि बाप आहे म्हटलं.
उदय०--काय... काय म्हणालो मी? माझ्या बाबांच्याविषयी काही बोललो? छे छे. त्यात काही अर्थ नाही. त्या गोष्टीच्या आठवणीनं तिनं मला वेडंच लागलं आहे. भलत्याच वेळी त्याबद्दल उगाच काहीतरी मी बडबडतो झालं.... मी काय बरं म्हणणार होतो? हो. राणी रूपमतीला.... माझ्या आईला भेटल्याशिवाय मी कसा परत जावू?
कमल०--मला न्याय मिळालाच पाहिजे, असंच नाही का काहीसं आपण म्हणालात? महाराज, आपण वेडाचं कितीहि सोंग पांघरलंत, तरी बिजलीच्या कडकडाटासारखे आपले ते शब्द माझ्या काळजात घुसले बरं. हा मारेकऱ्याचा गुप्त वेष, त्वेषानं तारवटलेली ही नजर, कपाळावर सणाणणाऱ्या या शिरा..... अखेर रक्तपात, हाच ना आपला उद्देश? महाराज, धर्मपित्याच्या रक्तपाताला कळत नकळत मी कारण झाल्ये, तर माझ्या मनाची काय स्थिति होईल, याचा विचार करा.
उदय०--धर्मपित्याचा रक्तपात?
कमल०--नाहीतर काय? महाराज, आपली राक्षसी प्रतिज्ञा छपवण्याची धडपड फुकट आहे. माझ्या धर्मपित्याच्या रक्ताच्या घोटासाठी त्याच्याभोवती घिरट्या घालणारा, मी उघड्या डोळ्यानी पहात असतां, त्याचा मी प्रतिकार केला नाही, तर माझ्या पातकांची मोजदाद करताना, महाराज, चित्रगुप्तालासुद्धा किळस येईल. नको नको, देवा, माझ्या हातूनं असलं पातक घडवू नकोस.
उदय०--कमल, हेच का तुझं माझ्यावरचं प्रेम? शेरशहाच्या कचाट्यातून तुझी सुटका करताना प्राणाची तमा नाही बाळगली मी. त्या उपकाराची फेड तूं अशीच करणार काय?
कमल०--बापाच्या रक्तनं माखलेलं पाणिदान तरी मी आपल्याला कसं करू महाराज. आणि केलंच, तर आपण तरी कोणत्या भावनेनं त्याचा स्वीकार करणार? माझ्या पित्याशी अितक्या अिमानानं मला वागलं पाहिजे, तितक्याच अिमानानं आपल्याहि कल्याणासाठी जिवाची कुरवंडी करायला मी तयार आहे. धर्मपिता आणि भावी पति.... मानीत असाल तर.... यांपैकी कुणाचंहि रक्त सांडलेलं मला पाहवणार नाही.
उदय०--हा तुझा हट्ट तडीला जाणार नाही. बनबीर किंवा उदयसिंह यांपैकी एक ठार झाल्याशिवाय, दुसऱ्याला जगण्याची मुळी सवलतच उरलेली नाही. दोघांपैकी कमलदेवीला जो विशेष प्रिय असेल, त्याच्यासाठी खुशाल तिनं आपल्या जिवाचा आटारेटा करावा.
कमल०--महाराज, माझ्या निर्मल भाबड्या भक्तीची अशी विटंबना करू नका. मला माझा पिता जसा प्रिय आहे..
उदय०--तुझा बाप, जुलमी अत्याचारी सैतान नाही का? त्यानं माझ्या बापाचा खून नाही का केला?
कमल०--महाराज, महाराज, क्षमा करा. माझी अब्रू अशी चव्हाट्यावर आणू नका. पाषाणहृदयी राजकारणानं माझे बाबा माणुसकीला मुकले असले, तरी मी त्यांची धर्मकन्या आहे आणि पोटच्या पोरीसारखं त्यानी माझं लालनपालन केलं आहे, ही गोष्ट मला कशी डोळ्याआड करता येईल?
उदय०--त्या नराधमाच्या सर्व घाणेरड्या पातकांची वाटेकरी व्हायला, कमलदेवीची तयारी आहे म्हणायची?
कमल०--देवा, एकलिंगजी महादेवा, असला प्रसंग माझ्यावर आणू नकोस. काही झालं तरी बाबांचा प्राण मला वाचवलाच पाहिजे.
उदय०--एवढंच ना? तेवढ्यासाठी तुझ्या एकनिष्ठेच्या नाटकाची मुळीच जरूर नाही. चल हो पुढं. तुझ्या बापासमोर नेऊन कर मला अभा. नाहीतर, जा, जा, त्यालाच आत्ता अिकडं घेऊन ये. बनबीर, तुझा हाडवैरी उदयसिंह तो मीच, असं मीच त्याला छातीठोक सांगताच, राजपुरुषाच्या रक्ताला चटावलेली त्याची ही कट्यार, झपकन् या छातीत घुसेल आणि तींतून अडणाऱ्या लालभडक रक्ताच्या पिचकाऱ्या पाहून, पितृभक्त कमलदेवी, तूं आपल्या डोळ्यांचं पारणं चांगलं फेडून घे. बोल, मला तिकडं घेऊन जातेस.... का त्याला जिकडे आणतेस? उदयसिंह ठार झाल्याशिवाय बनबीर जिवंत ठेवायला, प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा आता समर्थ नाही. जा. उदयसिंहाच्या रक्ताच्या अभिषेकानं तरी तुझ्या बापाला चिरंजीव केल्याची पुण्याई मिळवून, चितोडच्या इतिहासात तुझे नाव गाजवून घे.
कमल०--काळजाचं पाणी पाणी केलंत महाराज माझ्या. कोणत्या पातकासाठी देवा माझा असा छळ चालवला आहेस तूं. महाराज, या कमलच्या मृत्यूनं जर माझा पिता न् पति शीरसलामत जिवंत रहात असतील, तर ही हिरकणी चावून.... (अंगठी चावू लागते, तोच उदयसिंह तिचा हात पकडून दूर करतो.)
उदय०--कमल, कमल, काय करतेस हे? आत्महत्या? महापातक, प्रेमी जिवाच्या सुखासाठी आत्महत्या हेच एक साधन असतं. तर प्रेमळ हृदयदेवते, तुझ्यावर सौख्याचा मुसळधार पाऊस पाडण्यासाठी, या खंजिरानं उदयसिंहाच्या छातीचा कोट फोडून, तुला केव्हाच धन्य केली असती. जगातल्या दुक्खाना रामराम ठोकण्याचं, आत्महत्त्या हे अंकच साधन असतं, तर कमल, तुझ्याआधी माझ्या दुर्दैवी मातेनं त्याचा खास अपयोग केला असता. पण लक्ष्यात ठेव, माझी माता रजपूत वीरांगना आहे. ती आत्महत्येचा असला भ्याड मार्ग कधीच पत्करणार नाही.
कमल०--पण महाराज, माझ्या पित्याचा धडधडीत खून होत असता, मी तो उघड्या डोळ्यांनी कसा हो पाहू?
उदय०--माझ्या बापाचा खून मी नाही का डोळे उघडे ठेवून पाहिला?
कमल०--तसाच मी पण पाहू म्हणता? कसं मला ते सहन होईल? त्यापेक्षा महाराज आपल्या या पायाच्या दासीला आपल्याच हातानं आत्ता अिथं खापलून ठार केलीत, तरी माझ्या जिवाचं सोन होअील. माझ्या प्राणाच्या परमेश्वराला उदण्ड आयुष्य चिंतीत मी देवाच्या पायाशी जाऊन पडेन. (रडू लागते.)
उदय०--कमल रडू नकोस. तुझ्या डोळ्यांतूनं टपकणारे हे अश्रूबिंदू माझ्या काळजाला सांडशीच्या डागण्या देत आहेत. चल, पूस पाहू हीं आंसवं, तुला रडवून मिळणाऱ्या कसल्याहि यशाची मला पर्वा नाही. पण आजचा मुकाबला दुसऱ्या कोणत्या मार्गानं सफाअीत पार पाडता येअील, याची तूच तरकीब काढ. चल मी आपला हट्ट देतो सोडून, पण माझ्यासाठी तूं बेचैन होऊ नकोस.
कमल०--आत्ताच्या आत्ता आपण चितोडगड सोडून निघून जा. आपल्या मनाला झालेल्या भयंकर जखमांची मला चांगली जाणीव आहे. पण महाराज, खुनाचा सूड खुनानं घेण्याचा अघोरी विचार आपल्या दिल्दार मनात आणू नका. आपण आपला हट्टचं तडीला न्याल, तर जिकडं तिकडं अनर्थ माजेल, याचा या कमलसाठी तरी थोडा विचार करा. आत्ताच्या आत्ता याच पावली, याच काळ्या वेषात, अंधाऱ्या रात्रीच्या बुरख्याखाली चितोड सोडून निघून जा. पाया पडते, जा गडे आता....
उदय०--पण कमल, जिवाचं रान करून, मी माझ्या आईच्या दर्शनासाठी प्रत्यक्ष काळाच्या नरड्यात उडी घेतली, तिच्या नुसत्या नजरभेटीला सुद्धा तूं मला पारखा करतेस? तुला नाही का कधि तुझ्या जन्मदात्या आईची आठवण होत?
कमल०--गाय वासराची ताटातूट करण्याचं पाप मी कशी करीन? आज मी कुमारी असले, तरी मातृपदांनंच माझ्या जीवन-सौभाग्याची अखेर होणार ना? पण महाराज, प्रसंगाचा विचार करा.
उदय०--मातृदर्शनाच्या स्वर्गसुखापुढं, कमल प्राणांतीच्या हव्या त्या दिव्याचे वज्रप्रहार आनंदानं मी सहन करीन. पण या कुडीतूनं प्राण जाण्यापूर्वी, या दुर्दैवी जीवाला आपल्या आईच्या हृदयावर अखेरचे दोन अश्रूबिंदू गाळण्याची तरी संधि मला देशील काय?
कमल०--संधि? संधि मी कां देणार नाही. आपल्या मृत्यूची बातमी अकून, राणीसाहेबांच्या अंत:करणाची अवस्था हिंवाळ्यात वठलेल्या उपवनासारखी झाली असेल. त्याना आपण अगत्य भेटून, त्यांच्या दुक्खाचा भार हलका करा, त्याना दीलदिलासा द्या आणि पहाट फुटण्यापूर्वीच गड सोडून जा.
उदय०--तुझ्या म्हणण्याप्रमाण मी अगत्य वागेने.
कमल०--न वागाल तर वेडानं माझं मस्तक फिरून मी भ्रमिष्ट होऊन.
उदय०--छे छे , तसं काही होणार नाही. हा पहा, आईच्या महालाकडेच मी चाललो. महालाचा रस्ता हाच ना?
कमल०--होय तोच, लवकर भेट घेऊन चितोडला रामराम ठोका. काही झालं तरी बाबांचे प्राण....पण नकोत ते विचार. गळ्याची शपथ आहे आपल्याला. पहाट फुटण्यापूर्वी अिथून निघून जा...
उदय०--त्याची नको तुला काळजी. जा आता स्वस्थ जाऊन नीज. झाल्या गोष्टी साफ विसरून जा. (जाऊ लागतो.)
कमल०--( जाते. पण लगेच परतते.) ऐकलं का म्हटलं? (तो परततो.) म्हटलं, मृत्युचा फास आपल्या मानेभोवती पडला आहे, ही गोष्ट नजरेआड करू नका.
उदय०--छे छे. असं कस होईल. (दोघे दोन बाजूंनी जातात.)
प्रवेश २ रा
स्थळ, स्थिति व पात्रें :- भव्य दिवाणखाना. उच्चस्थानी बनबीर. दोनी बाजूला सरदार. बाजूला एका मेजावर मद्याच्या सुराया प्याले वगैरे. सगळ्यांच्या हातांत मद्याने भरलेले प्याले आहेत. सिंहासनासमोर नर्तकींचा नाच चालू आहे. नर्तकी मुजरा करून जातात.
बनबीर०--कर्णपाल आणि सरदार दोस्त, भारतीय संगीत आणि नृत्य, या कलांची थोरवी न् माधुरी या कलावंतिणीनी फारच छान सिद्ध केली. आमची सारी हयात राजकारणी दलामलीत खर्ची पडल्यामुळं समशेरीच्या तलख पात्याप्रमाणंच कठोर बनलेल्या मनोवृत्तीला, या अनार मद्याच्या माधुरीप्रमाणं गोड स्नेहरसानं चटकन रंगवून गुंग करणारी जादू या संगीतात असेल, अशी आतापर्यन्त आमची समजूत नव्हती.
कर्ण०--राजधिराज हुजूरचं बोलणं केव्हाहि रास्त वाजवी न् योग्यच असायचं. संगीत तर मुळातच गोड, पण त्याच्या जोडीला मद्यप्राशनाचा थाट असला की त्या मजलसीची मजा काही और असते. नाच गाणं नि मद्य पिणं, हेच माणसाच खरं जिणं.
बनबीर०--संगीतापेक्षा मद्याला तूं विशेष महत्व देतोस कर्णपाल?
कर्ण०--खावंद देत नसतील तर मीसुद्धा देणार नाही. पण मद्याच्या सबरंगी मसाल्याशिवाय नुसता छुमछुम छनननचा पुलावा खात्रीनं खमंग बनणार नाही. अशी माझी समजूत आहे सरकार. पुष्कळ पट्टे सौंदर्यवान तरुणीच्या प्रेमासाठी उगाच आपल्या जिवाचे पापड भाजतात. पण मद्याच्या एकाच घुटक्यात सौंदर्य, तरुणी, प्रेम, स्वर्ग, मोक्ष, सब कुछ बडीबडी जडीबुट्टी बेशक भरी हुअि है. ऐसा अंदाज है खावंद.
बनवीर०--दोस्त हो, कर्णपालाच्या वाग्शैलीने कलावंतिणीच्या पैंजणाच्या झणत्कारालाहि आज मागे सारले आहे.
कर्ण०--याची पुण्याअी या पेल्यात साठवलेली आहे. खावंद, प्रेमाच्या मद्यापेक्षा, मद्याचं प्रेम मला विशेष वाटतं. मद्य कसं तयार करतात. माहीत आहे हुजूरला?
बनबीर०--मूर्खपणाचा सवाल आहे हा. बेहोष दारूबाजच असा प्रश्न विचारील. मद्य म्हणजे द्राक्षाचा रस.
कर्ण०--ही लौकिकी समजूत आहे सरकार. यकांच्या जिभांचा आणि सिंहाच्या काळजाचा रस्सा एकत्र मिसळून दारू ही चीज पैदा होते.
बनबीर०--याला पुरावा?
कर्ण०--पुराव्याशिवाय विधान, म्हणजे दारूशिवाय संगीताचा जलसा आणि डफ तुणतुण्याशिवाय तमाशा. असलं धाडस कोण सच्चा दारुबाज करील? बायकांच्या चवचाल जिभांचा अर्क दारूत असल्यामुळे, दारू ढोसताच पट्टीचे मुकेसुद्धा वाचाळ बनतात, आणि त्या अर्काच्या जोडीनेच, सिंहाच्या काळजाचा रस्सा भरपूर मिसळलेला असल्यामुळे, --काय होत? सांगा पाहू काय होतं?
सर्व दरबारी०--काय होतं? काय होते?
कर्ण०--हवा तो फाटका माणूस दारू ढोसताय सैतानाच्या अंगावर चढाअी करणारा धाडसी मर्द बनतो.
बनबीर०--शाब्बास शाब्बास कर्णपाल शाब्बास. हा तुझा नवीन शोध समुद्रमंथनातून सुरा निर्माण करणाऱ्या देवदैत्यांचा गर्वभार खात्रीनं उतरील. कर्णपालाच्या या मद्यसंशोधनाबद्दल, दोस्त सरदार, अनार मद्याची आणखी एक भरगच्च फैर झडली पाहिजे.
(सर्व:- अलबत अलबत, म्हणून प्याले भरू लागतात. मेजावरची एक जुनाट सुरयी कर्णपाल उचलतो.)
कर्ण०--दोस्त हो, थांबा महाराजांचा पेला भरू नका. आता तो याच प्राचीन सुरयीतल्या पुराणप्रसिद्ध मद्यानं भरला पाहिजे, या दिग्विजयी सुरयीकड खावंदानी एकवार आपली दिग्विजयी नजर द्यावी. बाप्पा रावळने चितोडगडाची प्राणप्रतिष्ठा करून, आपल्या राज्याभिषकाच्या दिवशी याच सुरयीतले पवित्र मद्य प्राशन केलं होतं. तेव्हापासून आत्तापर्यंत, या गादीवर जे जे महाराजे विराजमान झाले, त्यानी या मद्याचा घोट घेण्याचा संप्रदाय अखंड चालू ठेवलेला आहे. राजदण्डधाऱ्याशिवाय या मद्याला आजवर कोणीहि स्पर्श केलेला नाही. आणि याचा घुटका घेतल्याशिवाय चितोडाधिपतीचे ऐश्वर्य चिरंजीव टिकत नाही. विक्रमाजित महाराजानी या सुरयीचा धि:कार केला.
बनबीर०--त्या परिणामाची आठवण काढून नकोस. कर्णपाल, चल दे त्या सुरयीतला मद्याचा पेला चटकन भरून. त्याच्या प्राशनानं माझ्या सत्तेचा पाया मला चिरंजीव बसवलाच पाहिजे.
कर्ण०--अलबत. (पेला भरून देतो) हुजूरनी याचं प्राशन करताच, महाराज बनबीरांचा राजदण्ड काळाच्या काळदण्डाला सुद्धा भीक घालणार नाही, अशी या मद्याची पुरातन प्रचिति आहे.
(सर्व सरदार अपापले पेले भरून बनबीरासह उभे रहातात.)
बनबीर०--(पेल्यातील मद्याच्या रंगांत निखून पहात) कोणा तरी ऋषिमुनी महात्माच्या तपश्चर्येनं सिद्ध झालेल्या अमृता, तुझ्या दिव्य जादूनं या बनबिराला आता धन्य कर. समशेरीच्या मानवी पराक्रमांपेक्षा आणि राजकारणी दगाबाजीपेक्षा, मेवाडची सत्ता माझ्या हातांत चिरकाल टिकवण्याचं लोकोत्तर सामर्थ्य तुझ्यात असेल, तर ज्याच्या तेजानं या बनविराला अंतर्बाह्य उजाळा दे. तब्बल आठशे वर्षांच्या प्रचितीची, या अति रसरसणारी तुझी पुण्याअी मी आत्ता प्राशन करीत आहे. हिचा घोट माझ्या पोटात जातांच--
(बाबा बाबा, घात झाला. उदयसिंहाला मी आता पाहिला, अशी आरोळी मारीत झोपेतून उठलेली कमलदेवी धावत येते. तिची आरोळी ऐकताच, बनबिराच्या हातचा मद्याचा पेला निसटून खाली पडतो. फुटतो आणि मद्य सांडले जाते. सगळे घाबरून उठतात)
बनबीर०--(एकदम असळून ) कुठं पाहिलास उदयसिंह?
कमल०--आत्ता.... स्वप्नात.... बाबा.
(दरबारी अकमेकांकडे आश्चर्याने पहातात.)
बनबीर०--अवसानघातकी पोर.
कमल०--आजची रात्र मला काळरात्र दिसते बाबा. तुमचा जीव धोक्यात आहे. भयंकर संकटानी आपल्याला गराडा दिलेला आहे.
बनबीर०--पागल. कसलं तरी मिकारडं स्वप्न पाहून, माझ्या रंगाचा बदरंग करायला आलीस. कसला धोका न् कसली संकटं? चल बस स्वस्थ अिथं.
कर्ण०-- संकटं न् धोके आम्ही पार पिवून गिळून फस्त केले आहेत. स्वप्नं म्हंजे अपचनानं रात्रीच्या फुगवलेल्या पोटाची बदअवलाद. त्यांची आम्हाला भीति? मद्याच्या एका घोटात फडशा पाडू. जय बनबीर महाराजकी जय. (सर्व सरदारासह पेल्यातले मद्य पिता)
बनबीर०--कसल्या तरी भेसूर स्वप्नान भेदरवली असेल तुला. चल, मद्याचा एक पेला पिऊन त्या भीतीला उधळून लाव, आणि महालात जावून स्वस्थ नीज.
कर्ण०--दारू ढोसल्यावर दारूड्याला काळाचेसुद्धा भय वाटंत नाही. मग जित्या मुर्द्याची न् मेल्या मर्दाची त्याला काय पर्या?
बनबीर०--कर्णपाल, दे. कमलला मद्याचा एक भरगच्च पेला भरून दे. स्वप्नांचा सैतान हुसकून द्यायला मद्य हेच एक हुकमी शस्त्र नि बिनतोड़ तोडगा आहे.
(बेशक बेशक म्हणत कर्णपाल तिला पेला देतो.)
कमल०--(तो नाकारीत) मी मद्याला कधीच शिवत नाही, शिवले नाही, शिवणार नाही ( कर्णपालावर डोळे वटरीत) हो दूर लुबऱ्या. सगळीच स्वप्नं अशी पट्टेवारी नेण्यासारखी नसतात बाबा. पाया पडते, माझ्या स्वप्नाची अशी थट्टा करू नका. मला मारा तोडा, वाटेल तर आता जागच्या जागी ठार करा, पण आधी माझ स्वप्नं ऐका.
बनवीर०--दोस्त सरदार, गुलाब पाण्याच्या शिडकावाप्रमाणं चित्त शांत करणार संगीत आणि उत्साहाच्या पाकळ्या हळूहळू उमलविणारं मद्यप्राशन, यांचा भरघोस कार्यक्रम रंगल्यावर वेताळपंचविशीतल्या एकाद्या अद्भुतरम्य कहाणीनं आपलं मनोरंजन करणारा कुणीतरी चारण भाट हवाच होता आपल्याला. आमची लाडकी, राजकन्या कमलदेवी हे काम पार पाडणार आहे. स्वस्थ बसून हिची स्वप्नाची कादंबरी ऐकू या. हं, कादम्बरीदेवी चलना दो आपकी स्वप्नकहानी.
कमल०--कितीहि हेटाळणी करा, बाबा, ही कादम्बरी नाही, देवाचा इषारा आहे.
बन०--दोस्त सरदार, ऐका, देवाचा इषारा ऐका. हं. चालू द्या.
कमल०--बाबा स्वप्नात मी असं पाहिलं की चितेच्या राखेतून उदयसिंह जिवंत होऊन बाहेर पडला.....
बन०--अरे वा. बेटा चित्पावनच झाला म्हणायचा.
कमल०-- त्याचे कपडे रक्तानी भरलेले होते. त्याच्या सर्व शरिरात् नं रक्ताच्या जशा काही पिचकाऱ्या उडत होत्या. रक्तानी माखलेले त्याचे केस सायाळीच्या पिसांसारखे ताठ उभे होते. त्याचे डोळे.... अगबाई... आंगावर काटाच उभा राहतो... इंगळासारखे लालबुंद असून, तो अंतराळी भराभर चालत होता.
कर्ण०--अरे वा. उदयसिंह तो बडा अिलमी जादूगार बनगया.
कमल०--हातातल्या अंका भयंकर कट्यारीनं हवेतल्या हवेत तो त्वेषानं हातवारे करीत होता. त्याने एकदम एक भयंकर आरोळी मारली. त्यासरशी कितीतरी वेडीविद्री काळीकुट्ट भुतं भराभर जमून त्याच्याभवती नाचू लागली. त्यानं या राजवाड्याकडे बोट दाखवताच त्या भुतानी एकदम वेढा दिला आणि काडकन् सुरूंग फुटल्यासारखा आवाज होवून, हा राजवाडा जमीनदोस्त झाला. नदीच्या फुटल्या धरणासारखा त्या भुतांचा घोळका साऱ्या गडावर सैरावैरा थैमान घालू लागला, आणि... आणि....
बनबीर०--आणि? आणि पुढं काय झालं? सांग सांग, बेधडक सांग.
कर्ण०--ऐकायला आमचे कान तयार आहेत.
कमल०--आणि आमचे बाबा, असेच... अगदी याच थाटात, मजलसीला बसले असताना, उदयसिंहानं मोठी गर्जना केली अन् ताडकन आगावर झाप टाकून, हातातली कट्यार ताडकन् या या.... या अिथं छातीत खुपसली. बाबा बाबा बेसावध राहू नका. (गळ्याला मिठी मारून रडू लागते.)
बनबीर०--मूर्ख रे मूर्ख, अगदीच अजागळ. स्वप्नाना अितकं कुणी भितात वाटतं? चल, अगाच घाबरू नकोस उदयसिंहाची राखरांगोळी झाली आहे आणि तुझा पिता बनवीर तुझ्याजवळ शीरसलामत जिवंत आहे.
कर्ण०--चितोडगडावर उदयसिंह आता कशाला मरायला येतोय.
(एक नोकर धापा टाकीत येतो )
नोकर०-- राजाधिराज बनवीर महाराजांचा.... असो,
कर्ण०--कायरे से भेदरटा, धापा टाकीतसा आलास?
नोकर०--ब-ब-बातमीच तितकी.... ह्याची ही आहे. राजकुमार उदयसिंह जिवंत आहे.
बनबीर०--उदयसिंह जिवंत आहे?
नोकर०--इतकंच नव्हे तर या घडीला तो चितोडगडावर आहे, या बातमीनं लोकांतसुद्धा बण्डाच्या उठावणीची खळबळ उडाल्यासारखी दिसत आहे. निगा रख्खो मेहरबान. (जातो.)
कमल०--बाबा, हा पहा माझ्या स्वप्नाचा पडताळा.
बनबीर०--कसला आला आहे पडताळा नि ठोकताळा. असल्या बाजारगप्पानी भेदरून जाण्याअितका हा बनबीर कच्च्या मातीचा पुतळा समजतेस? उदयसिंह अजून जिवंत, निखालस खोटी गोष्ट.
कर्णपाल०--पण महाराज, बातमी खरी असो वा खोटी असो, हुजूरला तिकड दुर्लक्ष्य करून भागणार नाही. राजकारण दारूंत बुडाले, तरी ते राजकारणाच्या कदरीनेच हाताळलं पाहिजे.
कमल०--निदान या कमलसाठी तरी, बाबा, माझ्या स्वप्नाकडे दुर्लक्ष्य करू नका.
बनबीर०--उदयसिंहाच्या जिवंतपणाची बातमी खरी का खोटी, याचा तुम्ही सर्व सरदारानी आत्ताच्या आत्ता कस्सून तलास घ्या. चौकशीच्या सत्रासाठी गडावरचा मातीचा कण न् कण आणि दगडधोंडा पिळून मळून काढा.
(जो हुकूम जोहार, म्हणून सर्व सरदार जातात.)
कर्ण०--कर्णपाल था जरा. त्या केदारनाथाला आत्ताच्या आत्ता आमच्यापुढं आणून हजर कर.
कर्ण०--जो हुकूम (जातो.)
कमल०--नको नको बाबा, असा भलताच हट्ट धरू नका. तुमच्या जिवाची तुम्हाल पर्वा नसली, तरी माझ्या बाबांच्या जिवासाठी माझा जीव तिळतीळ तुटत आहे. बाबा पाया पडते, पदर पसरते, त्या केदारनाथाच्या नजरेला आपण पुन्हा पडूं नका.
बनबीर०--काय? केदारनाथाच्या नजरेला मी पडूं नको? त्या क्षुद्र चिलटाला भिण्याअितका तुझा पिता निर्बल नामर्द आहे. असं तुला वाटतं? मूर्ख पोरी, स्वप्नामुळं तुझा मेन्दू बिघडला खास. जा. जा. आपल्या महालात जाऊन स्वस्थ नीज. उदयसिंह जर खरोखरच जिवंत असेल, तर त्या हरामखोर ढोंगी केदारनाथाच्या अंगाला पलिते लावून जिवंत जाळल्याशिवाय मी राहणार नाही. कोण आहे तिकडे? जाबता. तो केदारनाथ अजून का येत नाही? जा, त्याला आत्ताच्या आत्ता अिथं घेऊन या.
कमल०--बाबा बाबा. हा हट्ट सोडून द्या. निदान त्याची या वेळी तरी भेट घेऊ नका. पाया पडते. तुम्ही नाही म्हणल्याशिवाय मी हे पाय सोडणार नाही.
बनबीर०--आचरट पोरी, चल दूर हो. नाहीतर लाथेच्या ठोकरीनं देऊन झुगारून नरकात. राजकारणात बायकांची ढवळाढवळ? नाही आम्हाला खपणार उदयसिंह जिवन्त? आमच्या हुकमाची असली उघडउघड पायमल्ली? नाही. नाही आम्हाला परवडणार.
कमल०--पण बाबा, उदयसिंह जिवंत आहे कुठे आणि जिवंत राहील तरी कसा? तो कधीच जगात् नं नाहीसा झाला. लोकानी उठवलेली त्याच्या जिवंतपणाची कण्डी, बाबा, अगदी खोटी न् खोडसाळ आहे. आपण कशाला तिकडं लक्ष देता? आपल्याला एवढं भिण्याचं कारण तरी काय म्हणते. आणि मी म्हणते, ही बातमी खरी असली, तरी तो बिचारा केदारनाथ खरोखरच हो निरपराधी आहे.
बनबीर०--वाह्यात कारटे, तुझं डोकं खात्रीनं ठिकाणावर नाही. म्हणून तूं ही असली परस्परविरोधी बडबड चालवली आहेस. चल जा. चालती हो. जातेस का नाही?.. निघून जा. म्हणून तुला कोण बजावीत आहे, माहीत आहे ना?
(ती जाऊ पहाते तोच आतून :- राजाधिराज बनबीर महाराजांचा जयजयकार. केदारनाथ दर्शनाला येत आहे. निगा रखो मेहेर्बान.)
बनबीर०--थांब, कमल, थांब. केदारनाथ अपराधी का निरपराधी, याचा दाखला तुझ्या समक्ष पटवून देतो.
कमल०--नको नको, मला तो दाखला पटायला नको आणि तो आपल्याला भेटायला पण नको. बाबा, बाबा, आधी त्याला थांबवा, येऊ देऊ नका, या वेळी तरी त्याला भेटू नका. (मोठ्याने) जाबता बंद. गोषा गोषा (केदार येतो आणि वंदन करतो.)
(स्व.) कशाला आले हे काळाच्या जबड्यात २
बनबीर०--कुणाच्या पुढं उभा आहेस याचा नीट विचार केलास केदार? ज्याचा वेष तू पांघरला आहेस, तो तूंच आहेस काय?
उदय०--म्हंजे? महाराजांना माझा संशय?
बनबीर०--होय. आम्हाला तुझा संशय येतो आहे. उदयसिंहाचा खून करणारा मारेकरी म्हणून तूं मिरवत आहेस.
उदय०--अलबत्.
बनबीर०--मग सांग, उदयसिंह जिवंत आहे का मेला?
उदय०--उदयसिंह जिवंत आहे का मेला?
बनबीर०--बेशरम. आमच्याच शब्दाचा प्रतिध्वनि काढतो? जाळून उभा खाक करीन.
कमल०--उदयसिंहाला तूं ठार मारलंस ना? सांग तर तसं झटकन.
बनबीर०--बोल, सरळ साफसाफ जबाब दे. नाहीतर हो मरणाला तयार.
(कमरेची तलवार उपसतो. कमल चटकन बनबीर नि उदयसिंहाच्या मध्ये जाऊन अभी रहाते.)
कमल०--बाबा, अजून किती अत्याचार करणार?
बनबीर०--कारटे, बाजूला हो.
कमल०--निरपराधी रक्ताच्या घोटाला चटावलेली तलवार आधी या माझ्या छातीतच घुसली पाहिजे.
बनबीर०-- कमल, दूर सर, बनबीराचा भडकता क्रोधाग्नि न्यायान्यायाची पर्वा बाळगीत नसतो.
कमल०--न्यायाला बेपर्वा असलेले राजदण्ड जागच्या जागी जळून खाक होतात. नाही मी बाजूला होणार.
उदय०--राजकन्ये, बाजूला हो. तुझ्या मध्यस्थीनं जगण्याची मला मुळीच अिच्छा नाही. राजाधिराज बनवीराची अिच्छा, हाच अीश्वरी न्याय, तो मला शिरसावध आहे. महाराज, थांबू नका, विचार करू नका, बिनधोक आपली समशेर या केदारनाथाच्या छातीत घुसू द्या. राजकन्ये, बाजूला हो.
कमल०--नाही. प्राण गेला तरी बाबांच्या हातून निरपराध्याचं रक्त सांडता कामा नये.
उदय०--तुझा हट्ट वेडेपणाचा आहे. महाराजांच्या हात् चं मरण, म्हंजे तपाशिवाय मोक्षाची प्राप्ती. ती मला तूं लाभू देत नाहीस? महाराज, आपली दिग्विजयी समशेर बेलाशक या केदारच्या छातीत घुसवा. म्हंजे तिला तरी माझ्या अिमानाचा ठाव पुरता लागेल, (कंबरेचा खंजीर काढून) अरेरे, या खंजिराला वाचा असती, तर उदयसिंहाच्या छातीतलं रक्त पिताना याला झालेला ब्रम्हानंद, आत्ता यानं खास गावून दाखवला असता. (खंजीर म्यान करतो.)
बनवीर०--केदार, खरोखरच उदयसिंहाचा खून तू केलास काय?
उदय०-- राजाधिराज, हा प्रश्न मला आता विचारू नका. आपल्या संशयाच्या कट्यारीनं माझा दिल जखमी झाला. यापुढं जिवंत रहाण्याची मला मुळीच अिच्छा नाही. सरकार, आता माघार घेऊ नका. आपल्या वज्रप्रहाराचं स्वागत करायला... या आभामी केदाराची छाती तयार आहे.
(छाती ताठ करून पवित्र्यात उभा रहातो.).
कमल०--निष्फलंक मनोवृत्तीशिवाय असलं धाडस कोण करील बाबा?
बनबीर०--(तलवार म्यान करीत) जा. राजकन्येच्या हट्टामुळंच आज आम्ही तुला जीवदान देत आहो. चल जा. चालता हो.
कमल०--चितोडगडावरनं आत्ताच्या आत्ता चालता हो. पुन्हा तोंड दाखवू नकोस.
बनबीर०--नाही. या प्रकरणाची आमची चौकशी पुरी होअीपर्यन्त, नेहमी आमच्या हाकेच्या टप्यात राह्यलं पाहिजे तुला.
उदय०--पडछायेसारखा हुजूरच्या पाठीवर आहेच आहे मी, ही खावंदानी खात्री ठेवावी. (जातो.)
कमल०--बाबा. कशाला पाहिजे हा आता गडावर? त्याला आत्ताच्या आत्ता घालवून द्या नं गडे.
बनबीर०--कमल, माझ्या धोरणाच्या आड तूं येऊ नकोस. जा. महालात जाऊन स्वस्थ नीज. म्हंजे खोडसाळ स्वप्नानं मस्तकात खवळलेला किड्यांचा बुजबुजाट नाहीसा होअील जा.
कमल०--मी जाते.... पण त्या केदारच्या नजरेला पुन्हा पडू नका. (जाते.)
बनबीर०--(स्व.) त्या केदारच्या नजरेला पुन्हा पडू नका, वरचे वर असा अिषाराही कां बरं देत आहे? माझ्या सामर्थ्याच्या पासंगालाहि पुरणार नाही, अशा या तरूण पोरात काय असं गूढ असावं, कां कमलनं त्याची जिवापाड तरफदारी करावी? त्याच्या नजरेला पुन्हा न पडण्याचा जिव्हाळ्याचा अिषारा द्यावा? आणि त्या अिषाऱ्यानं माझ्या खंबीर मनाचीहि शांति ढासळू लागावी? आगीचे लोळच्या लोळ बेफाम ओकणाऱ्या तोफांच्या तोंडावर बेगुमान घोडदौड चढवून, शेकडो गोलंदाजांची कत्तल सहज लीलेनं करणाऱ्या बनबिराची छाती, कमलच्या या कोमल अिषाऱ्यानं एकदम धडधडू लागावी? ज्याच्या नुसत्या नावाचा दरारा, दिल्लीच्या पातशाही दैवाचा झोला काबूल ते बंगाल गोता खात भडकवीत आहे. त्या बनबिराचं काळधैर्य आज का खाऊ लागावं? मनगटाच्या जोरावर काळाचा काळ बनून, शेकडो कर्दनकाळ बण्डखोराना धूळ चारणारा मी बनवीर.. मग एकाकी माझ्या तेखाला ओहोटी लागल्याचा भास मला कां होत आहे? कोणतं पाप... पा प.... पापांचे पर्वत... बेलगाम सत्तेच्या प्राप्तीसाठी मी अमानुष पापांचे पर्वत रचले. सत्तामदाच्या धुंदीत हज्जारो जीवांचे हकनाहक बळी घेतले. त्या पापांची पिशाच्चे... ही पहा..... ही पहा.... मसणवटीतल्या भुतांसारखी....ही पहा....माझ्याभोवती नंगा नाच घालीत आहेत..... हां खबरदार अशी एकदम लगट करू नका..... काय? तुम्ही माझ्या काळजाचे चाऊन चाऊन तुकडे करणार? अरेरे, किती आक्राळ विक्राळ यांच्या दाढा ह्या. छे, नाही बघवत यांच्याकडे.... पापांच्या पायावर उभारलेली सत्ता म्हजे वेताळ पापा, तुझ्या या भुतांच्या भुताटकीचा बिनशर्त बळी. हीच तुझ्या उपासनेची करवंटी अखेर तूं माझ्या हातांत देणार काय?..... पण आता या विचारांचा उपयोग काय? पापाच्या पुरस्कारानेच पराक्रमाचा पतंग थेट अंतराळापार भिरकावून, मी रंकाचा राव झालो. आता माघार? छट्. नरकात गेलो तरी आता पिछेहाटीची बात नाही. माझ्या पातकांच्या पिशाच्चांनो, पश्चातापाची सीमा ओलांडून पार झालेला हा बनवीर, दुष्कर्माच्या भुताटकींत, आता तुम्हाला सुद्धा चारीमुंडे चीत केल्याशिवाय राहणार नाही... बस्स, आता यापुढें, खून रक्तपात अत्याचार यांचाच राक्षसी धुमाकूळ मी खेळत बसणार. पुण्यकर्माचा पुरस्कर्ता म्हणून नावलौकीक कमावण्याची संधि जरी मला मिळाली नाही, तरी माझ्या मनाच्या मसणवटीला काबीज करणाऱ्या वेताळा, दुष्कर्माचा बादशहा म्हणून माझी कीर्ति इतिहासात मी अजरामर करून ठेवणार. पुण्याचा पुरुषोत्तम म्हणवून घेण्यापेक्षा, पापांचा परमेश्वर म्हणून बखरकारांनी माझें नांव आचंद्रार्क गायलं पाहिजे. बनबिराच्या मानी हृदया (मना), शोध कर..... नीट कसोशीन शोध कर. सव्दासनेचा एकादा क्षुद्र तंतू तुझ्या कोनाकोपन्यात कुठं दडून बसला असेल, तर त्याला आत्ताच्या आत्ता जाळून टाक. म्हणजे सदसद्विवेक बुद्धीच्या नरड्यावर टांच देवून, पश्चातापाचं उचल खाणारं भुत, मी हां हां म्हणतां कायमचं गाडून टाकीन (जातो.)
अंक तिसरा समाप्त.
अंक ४ था
प्रवेश १ ला
स्थळ आणि पात्रें : गडावरील मैदान जयपाळ व हमीर.
जयपाळ०--महाराजांच्या हातून अशी चूक कशी व्हावी, याचं मला नवल वाटतं.
तूं स्वता हा प्रकार पाहिलास?
हमीर०--नुसता डोळ्यानी पाहिला असं नव्हे, तर चांगला कानानी ऐकला.
जय आणि महाराजानी तिला आपलं नावसुद्धा सांगितलं?
हमीर०--सांगितल म्हणण्यापेक्षा, त्या पोरीनं त्याना चटकन ओळखून हाक मारली. महाराजांच्या मागे मी सावलीसारखा आहे, पण ती कमलदेवी तर राजवाड्यात ठिकठिकाणी त्यांचा पाठलाग करीत होतीसे दिसते.
जय०--आणि महाराजानी आपला हेतू सुद्धा तिला उघड सांगितला म्हणतोस?
हमीर०--उघडचसा काय अगदी स्पष्ट शब्दात सांगितला.
जय०--तर मग घात झाला हमीर, त्या बडबड्या पोरीच्या तोंडात कसलीच गोष्ट टिकायची नाही.
हमीर०--मला आहे तिचा स्वभाव माहीत.
जय०--आणि त्या राक्षसाला महाराजांच्या आगमनाचा नुसता वास आला पुरे, का आजची सारी मसलत फसून, आपला सर्वांचा घात होणार.
(उदयसिंह येतो.)
उदय०--घात होणार? काय म्हणून घात होणार.
जय०--महाराज, कमलदेवीला आपण आपल्या बातबेताचा सुगावा दिलात, काय म्हणावं या धाडसाला.
उदय०--धाडसच झालं नाही का ते?.... होऊ नये ती गोष्ट झाली खरी पण माझी खात्री आहे जयपाळ, कमलदेवी माझ्यावर खास उलटणार नाही.
जय०--हा तुमचा भ्रम आहे सरकार, त्या भावनावश पोरीच्या डोक्यात एकदा एकाद्या गोष्टीनं पोखरण घातली. का तिची बडबडी जीम कोणत्या वेळी कुठं काय आग लावील, याचा नेम नाही.
हमीर०--शिवाय बनविरानं तिला अितकी लाडावून ठेवली आहे, का त्याच्या जिवासाठी ती आक्रताळी पोर, तुमचा आमचा घात केल्याशिवाय रहाणार नाही.
उदय०--बापाच्या प्राणाअितकीच माझ्याहि जिवासाठी जीव द्यायला ती मागे पुढे पहाणार नाही.
जय०--पण सरकार, कमलदेवीच्या प्राणहत्येनं का आजचा मुकाबला तडीला जाणार आहे?
उदय०--अरे पण, आत्ताच नाही का स्वताच्या जिवावर उदार होऊन तिनं मला काळाच्या जबड्यातून ओडून काढलं? बरं, गडावरची व्यवस्था कशी काय आहे?
हमीर०--त्याची महाराजानी मुळीच काळजी करू नये. सारा गड आपल्या बाजूला आहे. सर्व मण्डळी ठिकठिकाणी जय्यत तयारीनं अिषाऱ्याची वाट पहात आहेत. मध्यरात्रीच्या पहारा-बदलीची दुसरी घांट ठणाणली का एकदम कत्तल सुरू होअील.
जय०--कन्दाहारी अनार मधानं बनबिराच्या घोडदळ पायदळात चोख बंदोबस्त केला आहे.
उदय०--आता मला एकेक क्षण युगासारखा वाटत आहे. तुमच्या शंकेप्रमाणं कमलदेवी जर काही गोंधळ करणार नाही, तर दोन तासांच्या आत, त्या जुलमी बनविला रसातळाला गाडून. चितोड पापमुक्त होअील.... अवघे दोन तास.
जय०--दोन तास कुठले? अवघा एकच तास उरलाय, पण महाराज. मला त्या पोरीची फार भीति वाटते. मधाच्या प्रकारानं बनबिराला आपल्या विषयी चांगलाच संशय आलेला आहे. पितृप्रेमाच्या अ माळ्यानं तिनं आपल्याला उघडकीला आणलं, तर एवढा मोठा व्यूह उभारून सुद्धा. एका क्षुल्लक चुकीसाठी आणखी बारा वर्षे बनबीराच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडता तुटायच्या नाहीत. म्हणून म्हणतो, आपण आत्ताच्या आता चितोड सोडून निघून जा.
हमीर०--सरकारच्या पायांच्या पुण्याअिनं, आजची मसलत ठरल्या घटकेला आम्ही फडशा पाडतो.
उदय०--काय म्हणता? त्या पाषाणहृदयी कामांध राक्षसाच्या झडपेत माझ्या दुबळ्या आईला अशीच सोडून मी निघून जाऊ? जान गेली तरी बेहत्तर, त्या नराधमां आजच्याच रात्री अतिप्रसंग करण्याची तिला धमकी दिलेली आहे. पडछायेसारखा त्याच्या मागावर राहून, तसाच काही प्रकार मला दिसला, तर चित्यासारखी झाप टाकून, त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय मी राहणार नाही.
हमीर०--महाराजानी हे काम माझ्यावर सोपवावं. मासाहेबांसाठी प्राणांचा घुरोळा करीन, पण सरकारनी अिथून चटकन निघून जावं. माझ्यासारखे क्षुद्र जीव, सरकार सलामत तर शेकडो हज्जारो लाख्खो मिळतील. पण लाखांचा पोषिंदा अिवल्याश्या कामावर खर्ची घातला, तर बखरकार न् भावी पिढ्या आमच्या नांवांवर थुंकतील. कृपा करून जयपाळबरोबर आपण निघून जावं सरकार राणीसाहेबांच्या संरक्षणाची जोखीम माझ्या शिरावर.
उदय०--मला तुम्ही, ऐन घटकेला चामडी बचावणारा नामर्द समजता काय? संकटाच्या भडकत्या ज्वालामुखीच्या जबड्यात आघाडीची उडी घ्यायची धडाडी ज्याच्या मनगटात नसेल, त्यानं राजदण्ड पेलण्याची मिजास मारू नये आणि त्या नामर्द षण्ढाचा महाराज महाराज म्हणून कुणी उदो उदो करू नये. गनिमाच्या छाताडावर आघाडीची चढाअी करणाऱ्या हिंमतबहाद्दरासाठीच, बाप्पा रावळाचा चितोडचा राजदण्ड जन्माला आलेला आहे. ही गोष्ट तुम्ही विसरलात तरी विक्रमाजिताच्या छाव्याला ती दृष्टीआड करता येणार नाही.... बस्. ते काही नाही. हा मी अस्साच माझ्या आईच्या राखणीसाठी त्या राक्षसाच्या पाळतीवर राहणार. या मुकाबल्यात मी मेलोच, तर माझ्या न् माझ्या आईच्या रक्ताच्या थेंबा थेंबाचा सूड उगवा आणि त्या राक्षसाच्या रक्ताच्या ओंजळी ओंजळीनं आम्हाला, तर्पण देऊन, चितोडच्या सूर्यांकित भगव्या झेण्डयाचा उद्धार करा.
जयo-- हमीर०--आज्ञा शिरसावंद्य.
उदय०--चला आटपा, बोलण्याच्या नादात काळ झपाझप चालला आहे, आणि बनबिराची काळघटका त्याच्या रक्ताचा घोट घ्यायला उतावीळ होत आहे.
जय०--महाराज, मला शंका येते, क्षमा करा. कमलदेवीची मनोहर मूर्ती आपल्या पुढं येऊन अभी राहिली.
उदय०--आणि तिनं बनबिराच्या प्राणदानासाठी माझ्या पायांवर लोळण घेतली, तर तारूण्यसहज प्रेमानं मी वितळून जाअीन, हीच ना तुझी शंका?
जय०--शंका आली, ती सांगितली. बेअदबी माफ.
उदय०--जयपाळ चितोडच्या उद्धारासाठी, स्वताच्या प्राणाची होळी करू पहाणाऱ्या उदयसिंहाला, एका तरुणीच्या प्रेमाची कितीशी मातब्बरी वाटंत असेल, याचा तूंच विचार कर. त्या बनबीर बोक्याला तर मी जीवदान देणार नाहीच नाही. पण माझ्या बेताच्या आड दुर्दैवान कमलदेवी आलीच, तर तिचाहि जोहार करायला मी मागंपुढं पहाणार नाही. तारुण्यसहज प्रेमाची भरारी कितीहि जबरदस्त असली, तरी माझ्या बापाच्या खुनाचा सूड उगवण्याची प्रतिज्ञा काळाच्या क्रौर्याची सुद्धा नांगी बोथट पाडील.
(आत गजराचा घणघणाट)
. . . कसली ही घंटा झाली?
जय०--मध्यरात्रीची हिली घण्टा.
हमीर०--अर्ध्या तासात दुसरी घण्टा ठणाणताच हल्ल्याला एकदम सुरवात होअील. चल, जयपाल, आपल्याला पुढच्या व्यवस्थेला लागलं पाहिजे
जय० हमीर०--महाराज, जोहार घ्यावा.
उदय०--दिलदार दोस्त, मला एकवार कडकडून भेटा. (दोघांना आलिंगन देतो.) कदाचित तुमची माझी ही अखेरचीच भेट असेल. कुणी सांगावं? (क्षत्रियांचा पैषा जितका धन्य, तितकाच तो पाषाणहृदयी असतो. कर्तव्याच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं पुरे, का माणूसकीच्या सर्व कोमल भावनांकडे त्याला पाठ फिरवावी लागते, अिमानी मित्रांनो, थोरल्या महाराजांच्या निष्ठेला जागून, त्यांच्या या पोरक्या पोराला, प्राणांतीच्या अनेक प्रसंगी, तुम्ही आपल्या जिवाच्या ढालीवर झेलून धरले, या तुमच्या स्नेहाची बक्षिसी परमेश्वर तुम्हाला आजच्या मुकाबल्याच्या यशाने देवो. सत्याची न् अीश्वरी न्यायाची कसोटी अजमावण्यासाठी आपण आता अतक्यातच विजयदेवतेच्या पाणिग्रहणासाठी समरांगणार सरसावणार. त्या जुलमी बनबिराच्या पापांचे घडे भरले असतील आणि भरतखंडाच्या सौभ्याग्यासाठी मेवाडच्या रजपुती सत्तेच्या पुनर्घटनेला परमेश्वराचा आशीर्वाद असेल, तर दोस्त हो. आजचा मुकाबला फत्ते केल्याशिवाय तुमच्या तेखदार तलवारी म्यानात परतणार नाहीत आणि या क्षणाला बनबिराच्या टाचेखाली गुलाम होऊन पडलेला चितोड, पुढच्याच क्षणाला त्याच्या मुडद्यावर ताठ उभा राहील, आणि दोन घटकानी उगवणाऱ्या सूर्यदेवाला, रजपुतांच्या सूर्य चिन्हांकित निशाणाच्या फडफडाटानं, अभिनव उद्धाराचं अभिवादन करील. दोस्तहो, जोहार.
दोघे०--जोहार जोहार.
(जातात.)
अंक ४ था
प्रवेश २ रा
(घाबरलेली नि बावरलेली चंचला धावत येते. दूर पहाते.)
चंचला०--कसं करायचं.... आता आता हाक तरी कुणाला मारू? ते पहा ... ते पहा .... महाराज राणीसाहेबांच्या महालाकडेच चालले .... होय, तिकडंच .... आज मात्र घात होणार ..... राणीसाहेब एकट्या... झोपी गेलेल्या ... आन् हा मेला बनबीर नराधम .... त्यांची अबरू कीं हो घेणार ..... अहो, कुणीतरी धावा हो धावा ..... कुणीच कसं फिरकत नाही या बाजूला? और का मोठ्यानं?? .... ताअीसाहेब ..... जयपाळ ..... अहो कुणीतरी चावा हो ....
(कर्णपाल येतो.)
कर्ण०--काय ग ए पोरी, कसला ठणाणा चालवलायंच अवढा? चितोडला आग लागली, का तुझा बाप मेला?
चंचला०--बाप मेल्याचं दुक्ख नाही .... पण चितोडच्या मातोश्रीची अब्रू घ्यायला .... पहा पहा ते महाराज चालले आहेत.
कर्ण०--राजानं राणीकडं नाही जायचं, तर काय तुझ्यासारख्या दासीकडं बघायचं? चल, जा आपल्या कामाला निघून.
चंचला०--म्हाताऱ्या कोल्ह्या, तुला काही लाज शरम?
कर्ण०--लाज शरम? दारूच्या घोटाबरोबर गेली गेली गडप पोटात.
चंचला०--राणी साहेबांवर बलात्कार होतोय न तुला त्याचं काहीच वाटंत नाही?
कर्ण०--बलात्कार? कुणी सांगितलं तुला हे? अग दोघांची गट्टी कधीचजमलेली आहे.
चंचला०--मेल्या, जिभेचे तुकडे होतील तुझ्या.
कर्ण०--मदिरेच्या भक्ताची जीभ आडवी पडली, तरी तुटत फुटत नसते. ध्यायचाय अनुभव? चल माझ्याबरोबर. अनार मघाच्या पिंपात तुला आरपार बुचकळून काढतो. पोटात दारू गेली... चांगली भरपूर गेली.... का दुनियेचा सारा रंग न्यारा दिसू लागतो. दारूची नशा डोळ्यांवर चढली म्हजे कुब्जा नारी अप्सरा दिसते आणि जबरदस्ताचा बलात्कार प्रेमाची कुरवाळणी ठरतो. जा आपल्या कामाला (जाऊ लागतो.)
चंचला०--(त्याला आडवून) कर्णपाल, मी पाया पडते हो तुमच्या. महाराजाना परत फिरवा. चितोडच्या राज्यश्रीची अब्रू वाचवा.
कर्ण०--ए मूर्ख पोरी, कसली आणलीस अब्रू न बेअब्रू? सचाधीशाच्या लहरीपुढं, अब्रूची किंमत दारूच्या फुटक्या पेल्याअितकीसुद्धा नसते. महाराजाना रूपमति राणी. हवी. हवी म्हणजे काय? हवीच. त्यात तुझ्या माझ्या बापाचं काय जातं? तुझं तरी काय जातं? बलात्कार झाला तर तो काय तुझ्यावर होणार आहे? त्यालासुद्धा भाग्य लागतं भाग्य.
चंचला०--छे छे छे छे. तुमची सगळ्याचीच काळजं कशी हो अशी अगदी उलटी?
कर्ण०--यथा राजा, तथा प्रजा, तुला कुणबिणीला हे राजकारण काय कपाळ समजणार? तशात तू दारूहि ढोसलेली नाहीस. तुला नाही समजणार ही जबरीच्या दोस्तीची भानगड. (जातो.)
चंचला०--सगळ्यांचीच मनं आज मेलेली दिसतात.
(एक पहारेकरी येतो. )
चंचला०--अरे बाबा ते पहा महाराज.... ते पहा महाराज....
पहारेकरी०--पाहिलं की रूपमतीच्या महालाकडे जाताहेत.
चंचला०--तुझ्या पाया पडते मी. कसंहि करून त्याना परतवशील का?
पहारेकरी०--परतवणार? कोण मी? छान, मी फासावर गेलो तर तूं थोडीच माझ्या नावानं कुकू पुसणार आहेस.
चंचला०--तूफासावर जाण्यापूर्वीच वाटलं तर पुसते..... हे पहा पुसलं. पण त्याना आडव रे आडव. ते राणीसाहेबांची अब्रूघेताहेत.
पहारेकरी०--तुझी तर नाही ना घेत? जा आपल्या कामाला. (जातो.)
चंचला०--(मोठ्याने) आज परमेश्वर मेला.... रजपुतांच्या आकिनीला आग लागली.... चितोडची राज्यश्री बुडाली.
(उदयसिंह येतो.)
उदय०--काय झालं? ओरडतेस कां?
चंचला०--केदारनाथ, तूं महाराजांचा पाळीव मारेकरी असलास, तरी तुला थोडी माणुसकी आहे का रे?
उदय०--माणुसकीच राहू दे. काय झालंय ते सांग चटकन.
चंचला०--ते पहा.... ते पहा.... दारू पिवून उन्मत झालेले बनबीर महाराज, रूपमति राणीसोहबांवर बलात्कार करण्यासाठी..... धाव धाव.... घुसले त्यांच्या महालात.
(उदयसिंह झपाट्याने धावत जातो.)
गेला तर खरा तिकड वेगानं... पण...पण... उदयसिंहाचा हा पोटभरू मारेकरी...बनबिराचा गुलाम आग्गबाअी.... भिडलाच की तो जाऊन महाराजाच्या नरड्याला.... आता?..... आता? अिकडंच आली ती लाट. (जाते. )
(उदयसिंह बनबिराची मानगुटी पाठीमागून धरून त्याला खेचीत आणतो? आणि एकदम पलट खाअन त्याच्या समोर होतो. कमरेची कटवार सरसावून.)
उदय०--मगरूर पाप्या. भोग आपल्या कर्माची फळं.
(बनबिरावर चढ़ाअी करीत असताना, बनबीर त्याचे मनगट पकडतो. हिसकाहिसकी, कट्यार काढून घेतो आणि उदयसिंहाला दूर लोटतो.)
बनबीर०--बैमान सैतान. अखेर बरोबर सापडलास. माझीच अटकळ बिनचूक खरीठरली..... कोण आहे तिकडे? (चार सेवक येतात.) पकडा या हरामखोराला.
उदय०--चाठार मराल, पुढं पाऊल टाकाल तर. मी निःशस्त्र असलो तरी, मगरूर
बनबीर, माझे नाव ऐकताच तुझ्या हातातली शस्त्रं गळून पडतील.
बन०--(सेवकाना) बेवकूब पकडा त्याला सांगतो ना मी? (सेवक सरसावतात.)
उदय०--संभाळा. पाठकण्याचा पिंजारा करीन. टीचभर पोटासाठी देशद्रोह... राजद्रोह करू नका. मागे फिरा, कुणाला पकडणार तुम्ही? मला? तुमच्या औरस राजाला? उदयसिंहाला?
बन०--कोण? उदयसिंह?
उदय०-- मदांध बनबीर, तुझा काळाचा काळ... पाहून घे.... हा उदयसिंह... नीट पाहून घे.
बन०--ओ हो, माझा हाडवैरी उदयसिंह? मला सापडलास, काळाचा काळ हा बनबीर, नीट पाहून घे. (सेवकाना खूण करतो. ते त्याला पकडून हात त्याचे हात बांधतात) जा घेऊन याला. आत्ताच्या अत्ता चव्हाट्यावर खांबाला बांधा. आधी याची जीभ कापून, लालबंद सांडशीने याचे डोळे फोडा आणि नंतर याच्या आंगाचे सालटे सोलून, लाथेच्या ठोकरीनं द्या झुगारून गडाखाली.
उदय०--(सेवक नेत असताना) उदयसिंह मेला तरी त्याच्या तळतळणाऱ्या आत्म्याचे शाप तुझ्या जुलमी राजदण्डाचे कोळसे कोळसे करतील.
बन०--सत्ताधाऱ्याना गुलामांचे असले शाप बाधत नसतात.
(शिपायी उदयसिंहाला खेचून नेतात. कर्णपाल येतो.)
कर्ण०--महाराजएचा जयजयकार असो, राजाधिराज, आजची रात्र बरीच धोक्याचीदिसते. गडावर सगळीकडं गुप्त बण्डाची काहीतरी धामधूम असल्याच्या बातम्या आहेत.
बन०--कर्णपाल, म्हातारपणामुळे तू काळाच्या फार मागे राहिलास.
कर्ण०--काळ नेहमीच म्हाताऱ्यांच्या पुढं उभा असतो. काळ नि म्हातारपण यांची शर्यतच लागलेली असते.
बन०--गडावरच्या खऱ्याखोट्या बण्डाळीचा नायक...उदयसिंह
कर्ण०--भूत होऊन परत आला की काय?
बन०--नाही, चांगला धडधाकट जिवंत... पण आत्तच गिरफदार होऊन मृत्यूचा जहरी प्याला पिण्यासाठी, तो पहा.... तो पहा.... चव्हाट्यावर रवाना झाला. ती पहा, दिवट्यांची दाटी होऊन, तमासगिरांची गर्दी होत आहे.
कर्ण०--तो प्रकार पाहूनच मी अिकड लगबगीने धावत आलो सरकार, महाराज. अनुदयसिहाला ठार मारून राणीच्या पाणिग्रहणाची तरकीब यशस्वी होणार नाही. उदयसिंहाचा मृत्यू...
बन०--तसा आमचा हुकूमच आहे.
कर्ण०--आणि रूपमतीच्या प्राप्तीचा मृत्यू यात काहीतरी तडजोड निघाल्याशिवाय,गडावर फैलावलेल्या बण्डाच्या गडबडीला पायबंध ठोकता येअील काय?
बनबीर०--उदयसिंहाला जिवंत ठेवून बनबिराला जिवंत रहाताच यायचं नाही.
कर्ण०--आणि उदयसिंहाला ठार मारूण राणीच्या प्रेमाचा किल्ला हुजूरला सरकरता येणार नाही.
बन०--रूपमतीच्या बिनशर्थ प्राप्तीचा प्रश्न आमच्या अजिंक्य महत्वाकांक्षेला कितीहि साजला शोभला, तरी एका हेकेखोर रांडरूच्या प्रेमयाचनेसाठी, मेवाडच्या सत्तेवर निखारे ओतायला हा बनबीर तयार नाही.
कर्ण०--पण खावन्द, खास हुजूरच्या हुकुमानं आम्ही मेवाडभर फैलावलेलीराणीच्या प्रेमदानाची बातमी आता खोटी ठरली, तर आमची तोंडं काळी होतील त्याचीवाट काय? सारे लोक या थेरड्याची माकडटवाळी करतील. सेवकांच्या भल्या बुऱ्या खटपटीना सरकारनीच पाठिंबा दिला नाही, तर सेवकाची निष्ठा गावभवानीच्याप्रेमाच्या पंगतीला जाऊन बसली तर त्याचे पाप सरकारच्या माथ्यावर. रूपमतीच्याप्रेमदानाचा मुकाबला डावलून आता मागणार नाही. खावन्दांचा बदलौकीक होअील.
बन०--माझा बदलौकीक? कसा होणार?
कर्ण०--पुढे टाकलेलं पाऊल आता मागे घेणार म्हणून.
बन०--प्राण गेला तरी नाही घेणार मागं, रक्तपाताच्या पुण्याअीवर कमावलेली सत्ता, रक्तपाताच्या जोरावरच आम्ही टिकवून धरणार. उदयसिंहाच्या रक्तानी माखलेल्या हातानी तुझ्या निरीला हात घालीन. ही आत्ताच केलेली प्रतिज्ञा भी फोल पाडू? शक्य नाही. कर्णपाल, मेवाडच्या सिंहासनाचे माझ्या डोळ्यांदेखत तुकडे तुकडे उडाले, तरी कोणत्याहि अिच्छेचा न् प्रतिज्ञेचा भंग झालेला मला साफ परवडणार नाही.
कर्ण०--उदयसिंहाच्या रक्तानं हुजूरचे हात माखलेच पाहिजेत आणि ते माखणारच. पण असं होण्यापूर्वी उदयसिंहाच्या जीवदानाच्या हुलकावणीनं, रूपमतीचं पाणिदान पटकावण्याची तरकीब लढवायला काय हरकत आहे? रूपमति बनबीरपत्न बनल्याबरोबर, राजकुमाराचा बिनबोभाट निकाल लावायला कितीसा उशीर?
बन०--कर्णपाल, तुझं डोकं अितकं मुत्सदी असेल, अशी मला कल्पना नव्हती.
कर्ण०--ही सरकारच्या पायाची पुण्यायी तर खरीच, पण त्यात मदिरेची पडलेली भर. मदिरेची निंदा करणारे कितीहि असले, तरी मदिरा नि मुत्सदगिरी ही जोडगोळीच राजकारणात आजवर बिनतोड ठरत आलेली आहे.
बन०--नेकजात कर्णपाल, तुझी मसलत आम्हाला बिलकुल मान्य आहे. आतापासून अर्ध्या घटकेच्या आत, आमच्या हातात हात देऊन, प्रेमाच्या सलोख्याला रूपमति तयार असेल, तर उदयसिंहाला केवळ जीवदानचसे काय, पण राज्यदान द्यायला आमची मंजुरी आहे.
कर्ण०--याला म्हणतात, सरकार, राजकारण आणि मुत्सदगिरी.
बन०--चालू रात्रीच्या आनंदात या बिकट घटनेची गोड भर पाडण्याची अकलेची करामत तुझ्यापाशी असेल, तर जा. त्या करामतीला कसाला लावून, आम्हाला धन्य कर.
कर्ण०--बंदा या कामी मुळीच कसूर करणार नाही. (जातो.)
बन०--(स्व.) चितोडावर गुप्त कटवाल्यांची धामधूम? माझं मन खास अस्वस्थ होत आहे. माझ्या कर्दनकाळ दराऱ्याची पोलादी तटबन्दी फोडून, बण्डाळीचे भूत खरोखरीच आत घुसले असेल, तर माझ्या सत्तेच्या टिकावासाठी, रूपमतीच्या प्राप्तीच्या आशेला लाथाडून, या भुतांच्या भूतनाथाला, त्या दुष्मन उदयसिंहाला ठार मारलाच पाहिजे.
(आत : कमल०- बाबा, बाबा, कुठे आहात तुम्ही?)
बन०--कोण? कमल, (ती येते.) अजून तूं झोपली नाहीस?
कमल०--निरपराधी जीवाची हत्या होत असतां, झोप येणार कशी नि मी ती घेऊ तरी कशी? बाबा, आपल्या या लाडक्या मुलीसाठी तरी त्या उमद्या तरूणावर दया दाखवा.
बन०--दया? दगाबाज दुस्मानावर दया? कोणाची तरफदारी करीत आहेस याचा विचार केलास?
कमल०--रागाच्या झटक्यात ज्याला आपण मृत्यूची शिक्षा फर्मावली., त्या हतभागी उदयसिंहाशिवाय दुसऱ्या कुणाची भी तरफदारी करू?
बन०--त्याला फर्मावलेली शिक्षा न्यायाची आहे. तुझ्या बापाचा खून करायला धावलेल्या मारेकऱ्याची तरफदारी करताना, कमल, तुला शरम नाही वाटंत?
कमल०--त्याच्या ठिकाणी आपण असता, तर असेच नसता का वागला? जन्मदात्या आअवर होणारा बलात्कार आपण तरी मुकाट्याने सहन केला असता का? बाबा आपल्यालाही आअ होती, तिची आठवण करा आणि रूपमतीसारखाच प्रसंग तिच्यावर..
बन०--कारटे, आईच्या आठवणीनं माझ्या काळजाला करवत लावू नकोस.
कमल०--आणि महाराज, केवळ सत्तेच्या धुंदीनं सत्याच्या मानेवर आपणहि आपल्या सूडाची कुऱ्हाड चालवू नका.
बन०--सत्याची मान? कसल्या सत्याची मान? त्या हरामखोरानं तुझ्या स्वनातल्या सत्याला मात्र बिनचूक मान दिला खरा, सारा हरामखोर विश्वासघातकी घरमेद्यांचा बाजार, चल जा, चालती हो अिथून, त्या राजद्रोही सोंगाड्या मारेकऱ्याची तरफदारी करून, कृतघ्न कारटे, तूं पण माझ्याशी दगाबाजी करीत आहेस.
कमल०--बाबा, शेरशहाच्या बंदीतून त्यानीच नाही का माझा बचाव करून, तुमची अब्रू बचावली? मला आज त्यांच्या त्या उपकारांची फेड केलीच पाहिजे. माझ्या उदयसिंहाच्या प्राणांची मला भिक्षा घालीतोंवर अश्शी मी या पायांवर अश्रूचा अभिषेक करीत लोळण घेणार, पृथ्विराज महाराजांवर, आपल्या वडलांवर, प्रेमाची झडप घालणाऱ्या, आपल्या मातोश्रीच्या तारूण्याची, बाबा, थोडीशी कल्पना करून पहा.
बन०--बेमान दगाबाज कारटे, माझ्या दुस्मानाशी संगनमत करून छान छान माझ्या प्रेमाचे पांग फेडलेस.
कमल०--बाबा बाबा, काय बोलता हे? तुमच्या प्राणाच्या प्रेमासाठीच उदयसिहाच्या प्राणाचं प्रेम मला विशेष वाटतंय. तुम्हा दोघांच्या प्रेमासाठी, मी माझ्या प्राणाच्या प्रेमाची होळी करायला तयार आहे. बनबीर आणि उदयसिंह दोघंहि शीरसलामत जगावे. म्हणून ही कमलदेवी आपल्या जिवाचा जोहार करायला तयार आहे.
बन०--साप मुंगसाच्या जानीदोस्तीची बंद कर ही बडबड. माझा दुस्मन उदयसिंह मेलाच पाहिजे.
कमल०--त्यांचा जीव घेण्यापूर्वी, बाबा, माझा जीव घ्या. (बनबिराच्या कमरेची कट्यार काढून त्याच्या हातात देते.) घ्या ही कट्यार अन् करा या हतभागी कारटीला ठार, (बनबीर कट्यार म्यानात ठेवतो.) कशाला आता माघार घेता? बाबा, लक्षात ठेवा, कमलाचा प्राण घेतल्याशिवाय, उदयसिंहाचा प्राण घेण्याची खुद बनबिराची छाती नाही.
बन०--एका बण्डखोर तरुणासाठी बापाच्या जिवावर उठलेल्या नागिणी, तुला जागच्या जागी ठेचून ठार करणं मला खचित कठीण नाही.
कमल०--मग करा ना ठार? ही मी तयारच आहे.
बन०--उदयसिंहाला ठार मारला का जिवंतपणीच मृत्यूचा तुला अनुभव येशील जा. जिथून निघून जा.
कमल०--जिवावर उदार झालेल्या या निश्शस्त्र मुलीला कशाला हव्यात याधमक्या?
बन०--आधी अिथनं निघून जा.
कमल०--नाही जात म्हटलं तर काय आपण माझं काय करणार? जीवच घेणार ना? घ्या. मला तरी तेच हवे. बनवीर महाराज, उदयसिंहाच्या नुसत्या केसाला हात लावण्यासाठी, या कमलचं प्रेतच तुडवीत जावं लागेल तुम्हाला, हे लक्षात असू द्या. (जाते).
बन०--कोण आहे तिकडं? जाबता? जयपाळ..... जयपाल? (एक नोकर येतो.)
नोकर०--जयपाळ जागेवर नाहीत. मी आहे सरकार.
बन०--जयपाळ कुठे आहे?
नोकर०--मध्यरात्रीपासून जयपाळ सरदारांचा पत्ता नाही.
बन०--जयपाळाचा पत्ता नाही?
नोकर०--बिलकुल बेपत्ता. कर्णपालसुद्धा तुझा शोध करून थकले. वाडयात नाही गडावरसुद्धा कुठेच नाहीत.
बन०--आस्स बरं, जयपाळ नाही तर नाही. तूंच जा पाहू राजकन्येच्या पाठोपाठ. मेंदूच्या विकारानं तिचं डोकं फिरल्यासारखं झालयं. वेडाच्या भरात ती आक्रस्ताळी पोर भलतंसलतं करणार नाही, अशी खबरदारी घे. जा.
(आज्ञा म्हणून नोकर जातो.)
बन०--(स्व.) जयपाल बेपत्ता? त्यानं सुद्धा मला दगाच दिला असावा काय? जिकडे तिकड दगाबाजी न् विश्वासघात. धि:कार धिःकार माझ्या जीविताला न् सत्तेला. घाणेरड्या खातेऱ्यात मनसोक्त वळवळणारा किडासुद्धा माझ्यापेक्षा खात्रीनं अधिक सुखी असेल, नरांचा नराधीष, कोट्यवधि प्रजेचा स्वामी, सत्तेच्या शिखराला गेलो, तरी भणंग भिकाऱ्यांच्या नशिबातलं समाधानसुद्धा माझ्या वाट्याला कधि आलं नाही. काळीज तोडणाऱ्या मनाच्या या वेदना... नाही, नाही मला आता सहन होत, निरंकुश सत्तेच्या चवचाल महत्वाकांक्षेच्या नादी लावून... मी खास फसलो. माणूसकीला मुकून समाधानाला पारखा झालो. सच्च्या मित्रांच्या जिव्हाळयाला लाथाडून, खुषमस्कऱ्यांच्या पोटार्थी मसलतीना बळी पडलो. अधिराजपणाच्या घमेंडीने खऱ्या खोट्या राजद्रोहाची पाळंमुळं उखडण्याच्या भरात, माझा नीच आत्मद्रोही बनली. अरेरे.... आत्मद्रोह.... माझा मीच वैरी, माझा मीच दुश्मन् सत्तेच्या न् वैभवाच्या अत्युच्च सुळक्यावर एकटाच उभा असलेल्या आत्मद्रोही बनबिरा, कोण तुला आता अिथं आधार देणार? ... ओ हो हो हो. केवढा भयंकर उंच हा सुळका. खाली.... पुढे... मागे.... नजर ठरत नाही. वर? हा हा हा, वर तर सारे आकाश फाटलेले. ...काय? पुन्हा पश्चातापाच्या पिशाच्चांची माझ्यावर चढाअी? छट्. आकाश फाटून धरणी दुभंग झाली, तरी हा पापाचा परमेश्वर बनबीर, पश्चात्तापाला पालथा पाडून, पाशवी पराक्रमाने, काळाचा काळ म्हणून दुनियेला बेजार करणार (जातो.)
अंक चौथा समाप्त.
अंक ५ वा
प्रवेश १ ला
स्थळ, स्थिति आणि पात्रें
उदयसिंह हातापायात बेड्या घातलेला आणि एका खांबाला बांधलेला. आजूबाजूला तलवारी सरसावलेले मारेकरी. शेजारी कर्णपाल त्याची समजूत घालीत आहे.
कर्ण०--राजकुमार, हा हट्ट सोडून द्या.
उदय०--कर्णपाल, कशाला उगीच ही वटवट चालविली आहेस? मरणाला मर्दानी मिठी मारायला मी उभा असता, तुझ्यासारख्या बुढ्या माकडाला ही बेशरम वकिली करायला, त्या नराधमानंच पाठवलं असेल, तर खाल्ल्या मिठाचं पांढऱ्या केसाअितकंच सार्थक तूं करीत आहेस. पण माफीच्या मुक्ततेची मसलत, हा तुझाच लांडा कारभार असेल, तर म्हातारपणाबरोबर मनाची मुंडी मुरगाळण्याचा मुर्दाडपणा तूं छान कमावलास, असंच म्हणावं लागेल.
कर्ण०--राजकुमार, तुम्ही काहीहि बोललात, तरी मला मुळीच राग येणार नाही.
उदय०--कशाला येईल? ज्यांचं मन आणि रक्तच ठार मेलेलं, त्याना राग येणार कुठून. पोटासाठी खऱ्या खोट्याची मुस्कटदाबी, ही वकिली धंद्याची मुर्दाड चतुरायी कुप्रसिद्धच आहे.
कर्ण०--मी तुमच्या एवढा-अगदी अस्साच -तरणा जवान बाण्ड होतो, तेव्हा मी असाच काहीतरी अद्वातद्वा भकतअसे. जवानीचा भररंग काही न्यारा न् और असतो.
उदय०--त्या रंगाच्या पुण्याईवरच ना त्या बदअफलाद बनबिराची जुलमी सत्ता तुम्ही मेवाडच्या छातीवर नाचवता आहात ना?
कर्ण०--जवान जिभली वादविवादात अशीच जबरदस्त असते, याची मला चांगली आठवण आहे. तारुण्याच्या भरअंमदानीत माझ्याइतका बडबड्या मुत्सद्दी उभ्या मेवाडात नव्हता. तलवारीचा पट्टा एकीकडे आणि माझ्या जिभेचा पट्टा एकीकडे म्हणून आपल्या आजानं-राणा संगराजितान- या कर्णपालाला.....
उदय०--लंबकर्णाचा मान दिला असेल.
कर्ण०--छे. फत्तेपूर शिक्रीच्या लढाईत बाबराशी तहनाम्याची वाटाघाट करायला दरबारी वकील म्हणून धाडला होता.
उदय०--आस्स! फत्तेपूर शिक्रीच्या लढाईत रजपुती वर्चस्वावर कायमचा वरवंठा का फिरला, याचं गूढ आत्ता समजल मला.
कर्ण०--राजकुमार, साम्राज्याच्या बरकति फारकति दैवाधीन असतात. तिथं वकील काय करणार?
उदय०--आणि वकीलच आडवा पडल्यावर, दैव तरी कितीसं टिकाव धरणार? आमच्या काकासाहेबाना-रत्नसिंह महाराजाना बुन्दीच्या राजाबरोबर द्वंद्वयुद्धाची चिथावणी द्यायला आणि त्यात त्यांचा अकाली घात करायला आपलीच बुद्रुक वकिली खर्ची पडली असेल? कर्णपाल, लाजलज्जा कोळून प्यालात, तरी देवानं माणसाना काळीज म्हणून एक चीज दिलेली आहे. याची तुम्हा तोंडपुज्या वकिलाना काही जाणीव असते का रे?
कर्ण०--जाणीव नसते, असं कसं होईल राजकुमार? वकिलाची तिरंदाजी नेहमी काळजावरच चालते, निष्काळजी राहून त्यांचं भागतच नाही मला आपल्याबद्दल काही काळजी नसती, तर मरणाच्या महाद्वारातून आपल्याला खेचून काढायला कशाला आलो असतो अर्थ? द्या हा हट्ट सोडून आणि व्हा माफी मागून मोकळे.
उदय०--विक्रमाजिताच्या या मानधन युवराजानं-चितोडच्या या औरस राजदण्डधान्यानं-थेरड्या, तुझ्या या अस्सलबीज धन्यानं, त्या बण्डखोर खुनी बदमाष बदअफलाद बनबिराची हकनाहक माफी मागून मोकळं व्हावं, हीच ना राजनिष्ठ कुत्तरड्या तुझी काळजी न् विवंचना? बेहत्तर आहे जान गेली तर, पण दगाबाजीनं माझ्या बाबांचा खून करणाऱ्या खाटकापुढे हा उदयसिंह रेसभरसुद्धा मान चाकवणार नाही.
कर्ण०--तुझ्या हातूनं कसलंच अत्याचारी दुष्कृत्य घडलं नाही का?
उदय०--अत्याचारी दुष्कृत्य?
कर्ण०--प्राण घेण्याच्या इराद्यानं, जंबिया रोखून बनबीर महाराजावर तूं झाप टाकलीस ना?
उदय०--अलबत काय चुकलं त्यात?
कर्ण०--काय चुकलं? सारंच चुकलं.
उदय०--भर मेजवानीत माझ्या वडलांवर त्या राक्षसानं नव्हता का असाच हल्ला केला?
कर्ण०--तो यशवंत झाला न् तुझा डाव हुकला. खलास मामला. हारजितीच्या ताजव्यात राजकारणाची बढती उतरती भाजणी ठरत असते.
उदय०--हे सांगायला तुझी गरज नाही. यशापयशाचा मामला दैवाधीन किंवा देवाधीन ठेवून, संकल्प न प्रयत्न करणं, एवढंच माणसाच्या हाती आहे.माझं धाडस फसलं, त्याचा दोष देवाला नसून, तो मी माझ्या देवाला देतो. माझ्या धाडसाचा अजूनहि मला अभिमान वाटतो
कर्ण०--अभिमान वाटतो? आश्चर्य.
उदय०--लाजलज्जेचा होम करून, टीचभर पोटासाठी बायकाची अब्रू सत्ताधीशांच्या जनानखान्यात कोंबणाऱ्या नरपशूनाच आश्चर्य वाटणार. म्हाताऱ्या कोल्ह्या, स्वतःच्या आई, बायको, बहिणीवर एकादा लाण्डगा जर पाप वासनेनं बलात्कार करू लागला, तर षण्डा, ताडकन् त्याच्या नरडीचा तू घोट घेशील का हरिनामाचा गजर करीत बसशील? सारा मेवाड मातोश्री म्हणून जिला एकवार जोहार करीत होता, त्या राणी रूपमतीच्या पातिव्रत्यावर झडप घालणाऱ्या त्या लाण्डग्याचा, निजल्या गादीवर न् बसल्या बैठकीवर गळा दाबून जीव घेतला असतास, तर म्हाताऱ्या माकडा, या रियासतीच्या तीन पिढ्या खाल्लेल्या मिठाला जागल्याचंच पुण्य तरी तुझ्या पागल पदरात पडलं असत.
कर्ण०--राजकुमार, आपला गुन्हा केवढाहि असला, तरी क्ष म स्व या तीन अक्षराच्या नुसत्या उच्चारानी जर अकाली मरणाची आपत्ति टळत असेल, तर नुसत्या सत्यनिष्ठेच्या नादी लागण्यात काय अर्थ?
उदय०--काय? गुलामगिरीच्या बेहद जिण्यासाठी मी सत्याची पायमल्ली करू? सदसद्विवेक बुद्धीशी दगाबाजी करू?
कर्ण०--सत्याचा महिमा पुराणात उदंड वर्णिला आहे. पण कुमार, सत्ता हेच इतकं मोठे लांब रुंद सत्य आहे, का त्याच्या प्रभावापुढं सत्याची पुराणं फोल ठरतात. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. म्हणून म्हणतो, माझ्या पांढऱ्या केसांत भरलेला अनुभव, शांतपणानं विचारात घे. झाल्या गेल्या गोष्टी विसरून जा. महाराजांची क्षमा माग. त्यानाच विक्रमाजित महाराजांच्या ठिकाणी मानून, मातोश्रीसह त्यांची सेवा कर, म्हणजे राजदण्ड तुझाच आहे. महाराज कुठं नाही म्हणतात? त्यांच्यामागं चितोडचं सिंहासन तुझंच आहे. नाही कोण म्हणतो? पण राज्य चालवायला थोडी पात्रता लागते, अक्कल लागते, हिंमत लागते, ती महाराजांजवळ शिकलास, का आहे ते राज्य तुझेच. नाही कोण म्हणतो?
उदय०--कर्णपाल, बंद कर तुझी ही वटवट. राजनिष्ठेसारखा सद्गुण तुझ्यासारख्या पोटार्थी पार्थिवाच्या हाती गेला म्हणजे त्याची कशी नासाडी होते, याचा दाखला तू चांगला पटवलास. भल्या माणसा जा. तुझ्या अन्नदात्या धन्याला जाऊन सांग, सत्याला पाठ दाखवण्यापेक्षा तुझ्या अन्यायी सत्तेला शाप देत, मृत्यूला मिठी मारायला मी तयार आहे.
कर्ण०--मरायलाच जो तयार, त्याला जगवण्यात काय अर्थ? उदयसिंह, अजून विचार कर. महाराज तुला क्षमा करायला तयार आहेत. आततायीपणापेक्षा जुळत्या मिळत्या धोरणानं घेशील तर त्यात तुझं कल्याण आहे. मृत्यूच्या गप्पा मारतोस, पण त्याच्या वेदना सहन करणे, फार कठीण कर्म आहे राजा.
उदय०--अरे जा. सतीला सरणाची न् मर्दाला मरणाची का म्हणून भीति वाटावी?
कर्ण०--कुमार, मी जातो. पण लक्ष्यात ठेव. रूपमति महाराजांचं पाणिग्रहण करील. तरच तुला जीवदान मिळेल. (जातो.)
उदय०--हरामखोरा, मोकळा असतो तर जीभ उखडून घेतला असता तुझा जीव.
अरेरे, घरभेदानं पछाडलेल्या राष्ट्रात असल्याच नराधमांची पैदास फार असते अं.
(नागची तलवार घेऊन बनबीर येतो.)
बन०--सरता सवाल. तुझी आई आत्ताच्या आता, बिनतक्रार, आमच्या मंचकाचा स्वीकार करीत असेल, तरच तुला जीवदान मिळेल.
उदय०--बटकीच्या पोरा, स्वताच्या आईच्या व्यभिचाराचा कशाला असा चव्हाटयावर डंका पिटतोस? चितोडचा बदअफलाद चोर तूं. कोण तुझ्याजवळ कसली याचना करणार?
बन०--जा घेऊन या त्या तापवलेल्या सांडशी आणि फोडा याचे डोळे आत्ता आमच्या समक्ष. (नोकर आत जातात आणि सांडशी घेवून येतात. आमच्या मातोश्रीची निंदा? डागा याचे डोळे.
(घाबरलेला कर्णपाल धावत येतो. )
कर्ण०--दगाबाजी, सरकार, दगाबाजी. दक्षिण बुरुजाखाली बण्डवाल्यांची गर्दी उसळली आहे. पहाऱ्याच्या पहिल्याच ठोक्याला जयपाळ फरारी. त्याच्या स्वारांची पागा रिकामी.
बन०--जयपाळ हरामखोर झाला? कुछ पर्वा नहि जा. एकदम सैन्याच्या उठावणीचा आमचा हुकूम सेनापतीला जारी कर जा.
कर्ण०--आता हुकमाना जुमानणार कोण सरकार?
बन०--कां? आपल्या सैन्यातहि फितुर न् दगाबाजी?
कर्ण०--दगाबाजी नसली तरी नशाबाजी भरपूर आहे. बराकीतले सारे शिपायी दारू ढोसून मस्त अन् कलावंतिणीच्या मोहल्यात नाचगाण्यात मषगुल आहेत सरकार.
बन०--म्हंजे? याचा अर्थ काय?
कर्ण०--यथा राजा तथा प्रजा.
बन०--बनबिराच्या सैन्यात नशाबाजी?
कर्ण०--खास हुजूरच्या हुकमाने.
बन०--(स्व.) अरेरे. अखेर या बनबीराचा कड़वा दरारा दारूच्या पेल्यात पालथा पडण्याचा प्रसंग बितला आं? (मु०) कुछ हर्जा नहि. कर्णपाल, चल. आत्ताच्या आत्ता या बण्डाळीची भुताटकी दक्षिण बुरुजाखालीच गाडून टाकतो. (सुरुंगाचा स्फोट ऐकू येतो.)
कर्ण०--सरकार, सरकार, मामला काही ठीक दिसत नाही (पुन्हा स्फोट.) मला वाटतं, दक्षिण बुरूज कोसळला. चला चला. आलिया भोगासी सादर असलंच पाहिजे,
बन०--घाबरू नकोस. चल, पुढे हो.
कर्ण०--खावन्दानीच व्हावं पुढं. (स्व०) आम्ही झालो पुढं का पडलं आमचं मढं. (जातो.)
बन०--( मारेकल्यांना) फितुरीच्या या सैतानाला मुण्डीछाट ठार मारून, आम्हाला ताबडतोब वर्दी द्या. (जातो.)
उदय०--(स्व.) आस्सं. माझ्या सत्यसंकल्पाचे मोर्चे या नराधमाच्या नरडीला बिनचूक लागले खास.
मारेकरी०--(तलवारी परजीत) चल रे हो मरायला तयार.
उदय०--तुम्ही मारायला तयार आहात ना? मग विचारता कशाला? (पुन्हा स्फोटाचा आवाज.) धन्य झालो मी. पोटभरू पाप्यानो, ऐका. ऐका. काळाची ही काळ गर्जना का मरता मरता मेवाडचा पुनर्जन्म मी पहात आहे. चला. आटपा तुमचं काम.
(मारेकरी अवसानात अभे रहातात. कमलदेवी येते.)
कमल०--खबरदार मेल्यानो पुढं पाऊल टाकाल तर (उदयला मिठी मारून) आधी माझा जीव घ्या.
१ मारेकरी०--तसा हुकूम नाही बाईसाहब.
कमल०--राजकन्या ठार मेल्याशिवाय, राजकुमारांच्या केसाला धक्का लावण्याची खुद्द बनबिराची छाती नाही समजलात? जा चालते व्हा, असा माझा हुकूम आहे.
२ मारेकरी०--ठीक आहे तो हुकूम तसा. हा हुकूम असा.
१ मारेकरी०--आम्हाला काय? आम्ही हुकमाचे ताबेदार (दूर जातात. )
उदय०--कमल, मरणाच्या मंगल मार्गावरचं माझं पाऊल मागं खेचून तुला काय मिळालं? तूं आली नसतीस तर या क्षणाला माझा आत्मा स्वर्गाच्या स्वतंत्र वातावरणात स्वच्छंद विहार करण्याइतका तरी भाग्यवान झाला असता, प्रेमाच्या माणसानं भाग्याची लाट अशी आडवून धरणं, चांगल का?
कमल०--महाराज, कोणत्या तोंडानं आपल्याशी बोलू? माझ्या तोंडानं माझ्या दिलाशी दगाबाजी केली. माझ्या हळव्या मनानं पितृप्रेमासाठी पतिद्रोहाचं पाप माझ्या पदराला बांधलं. निष्ठेच्या निवडीत नादान बनलेल्या या पापिणीनं राणाजी, आपल्यासारख्या पुण्यात्म्याशी प्रतारणा केली. दगाबाजी केली.
उदय०--कमलच्या हात् नं दगाबाजी?
कमल०--मी आपला घात केला.
उदय०--परधर्मी पठाणांच्या दिवसांतून जिचा मी उद्धार केला, तीच कमलदेवी माझा घात करते? या कालकूट जहराचे थेम्ब माझ्या कानात ओतण्यापूर्वी, परमेश्वरा, माझ्यावर मरणाची मेहरबानी कां रे नाहीस केली? राजकन्ये, माझं मरण लांबणीवर टाकण्यात तुझ्या बापावर तू ताण केलीस.
कमल०--महाराज, माझ्या भोळ्या भावाकडं पहा, माझ्या कमकुवत भाबडेपणानंच आपल्याला मी मृत्यूच्या दारी उभं केलं.
उदय०--कमलदेवी, डोळे भरल्या केवीलवाण्या मुद्रेनं कशाला आता टक लावून माझ्याकडं पहातेस? तुझ्या लाडक्या बापाने माझ्या आंगावर कड्याबेड्यांचा हा भरजरी साज चढवून, या जामाताचा गौरव तर छान केला. या मारेकऱ्यांनी माझ्या शिरकमळाला धडापास् नं वेगळं केलं. म्हणजे त्यातून वहाणाऱ्या लालबुंद रक्ताच्या पाटात, तुला माझ्या प्रेमाची कसोटी बिनतोड अजमावता येईल.
कमल०--वीज कडाडून कोसळती तरी खुशाल मी गिळली असती. महाराज, देवानं न् दैवानं माझं हाडवैर साधलं. बोलू नये ते करवलं न् करू नये ते बोलवलं. ज्यानी माझी जान बचावली, त्याच महाभागाच्या मानेवर सुरी ठेवायला मी कारण व्हावं, कसं हे पाप चिकटलं मला देवा? बाबांच्याबद्दल आपली घोर प्रतिज्ञा ऐकून माझी गाळण उडाली. मन भ्रमिष्ट झालं जीभ हवं ते बरळू लागली, आणि अखेर. आणि अखेर...... राणाजी, मी आपला हा अस्सा घात केला.
उदय०--माझा घात तुझ्या पितृनिष्ठेने झाला, का मातृनिष्ठेन केला. या कोड्याचा उलगडा....
बंदुकांच्या फैरीचे आवाज, स्फोट, धरा, पकडा, दगाबाजी, खून, वगैरे संमिश्र आवाज मारेकरी परत येतात.)
१ मारेकरी०--[बाईसाहेब, बंद करा हे आपलं रडण्याचं गुऱ्हाळ. आम्हाला हा गुन्हेगार आता छाटलाच पाहिजे. चल रे हो तयार.
उदय०--किती वेळा विचारता रे तयार हो, तयार हो, म्हणून मी केव्हाच तयार आहे. तुम्ही कशाला माघार घेता? कमल, हो बाजूला.
कमल०--नाही मी व्हायची बाजूला. अश्शी याना चिकटून रहाणार. आम्हा दोघाना एकदमछाटाहवं तर.
२ मारेकरी०--अहो बाई तसा हुकूम नाही.
कमल०--हुकूम नाही, तर हा चालते इथनं.
१ मारेकरी०--चालते होण्याचा हुकूम नाही. (आत शिंगेतुताऱ्या वाजतात.)
उदय०--ऐका, ऐका , चितोडच्या जुलमी सत्तेची राखरांगोळी करणाऱ्या भूतनाथाची ही गर्जना ऐका. आ हा हा. एकलिंगेश्वरा, तुझी लीला अगाध आहे.
कमल०--महाराज, ही काय भानगड आहे? कसला हा भयंकर गलबला?
(कर्णपाल २-३ सैनिकांसह धावत येतो.)
कर्ण०--पळा पळा, जीव घेवून पळा बनबीर महाराज बेपत्ता. त्याना आधी शोधून काढा. त्याना वाचवा. (सैनिक धावत जातात.)
कमल०--कर्णपाल, कर्णपाल, कसला हा गलबला? काय झालं?
कर्ण०--कपाळ फुटलं तुमचं आमचं. दक्षिणेचा बुरूज सुरुंगाने उडवून, बण्डखोरांच्या फौजा समुद्राच्या लाटांसारख्या गडावर उसळत घुसल्या. (शिपायी परत येतात.) परत कशाला मरायला आलात? जा. कड्यावरून उड्या घेवून जीव द्या. या महाराजांचा बचाव करता येत नाही. कशाला झालात शिपायी? चला, हा चालते. (शिपायी जातात. मारेकऱ्याना पाहून) आणि तुम्ही रे कशाला खुंटासारखे इथे सुभे?
१ मारेकरी०--आम्ही हुकमाचे ताबेदार.
कर्ण०--हुकूम देणारे चालले मसणात, तुम्ही जा त्यांच्या सरणात. राजवाड्याची दारं फोडून गनीम आत घुसला आणि चोरांनो तुम्ही इथंच? चला व्हा चालते इथनं आणि पडा शत्रूच्या तोंडावर तुटून. चोर हरामखोर दगाबाज (मारेकरी जातात.) महाराजाना जिवंत पकडण्यासाठी राजवाड्याचा कोपरा न् कोपरा गनीम खणून कुदळून काढीत आहे. चला पळा, लढून मरा नाहीतर जीव बचवायला आयाबायांच्या मागे दडा. (जाती)
(आत: - तोफाची धडेबाजी, गलबला आणि राणा उदयसिंहाचा जयजयकार, अशा गर्जना.)
उदय०--मदांध बनबिरा, कृतकर्माचा कृतान्त काळ चढला अखेर तुझ्या छातीवर.
कमल०--(मिठी मारून) महाराज-महाराज कसला हा दंगा उसळलाय? माझ काळीज धडपडू लागलंय.
उदय०--जुलमी सत्तेला गाडून टाकण्यासाठी, पाप्यांचा नायनाट करणारा काळ आता खवळला आहे.
कमल०- म्हंजे? काय होणार आता?
उदय०--होत्याचं नव्हतं होणार, अशक्य शक्य होणार आणि पापी राक्षसाचा विध्वंस होणार.
कमल०--हे सारं कोण करणार?
उदय०--माणसांच्या रक्ताच्या पुरात, पोलादी समशेरीची लेखणी बुचकळून, अत्याचारी जुलमी सत्तेच्या विध्वंसनाचा इतिहास कृतान्त काळ आता लिहू लागला आहे.
कमल०--आता तो शांत नाही का होणार?
उदय०--आता त्याची लेखणी धरणार कोण? तो पहा-पहा-काळाचा थैथयाट. घाबरू नकोस, नीट डोळे उघडे ठेवून एकलिंगेश्वराचं हे ताण्डव नृत्य पहा.
कमल०--छे छे. मला चक्कर येत आहे महाराज.
उदय०--तुझ्या बापाच्या जुलमी सत्तेचं भूत, किल्ल्याच्या तटबंदीला तडाड उखडून, ते पहा-ते पहा. गडावर कसा नंगा नाच घालतयं ते. प्रेतांच्या राशी तुडवीत, तुझ्या बापाच्या पाठलागासाठी, साऱ्या चितोडला आता ते पिळून मळून काढील.
कमल०--महाराज पाया पडते, पदर पसरते. माझ्या शुद्ध प्रेमासाठी तरी माझ्या बाबाना या भुताटकीच्या वावटळीतूनं याचवा हो. चला, मी आपल्या या बेड्या तोडून आपल्याला मुक्त करते. (तसे करते.) चला गडे. आपण दोघेजण बाबांच्या संरक्षणासाठी जाऊ या.
उदय०--या एका गोष्टीशिवाय तुझ्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. पण त्या पण त्या पापाधमाचा बचाव करायला प्रत्यक्ष परमेश्वर जरी आता अवतरला, तरी त्यालासुद्धा या खवळलेल्या भुतांच्या भुताटकीपुढं आता हातच टेकले पाहिजेत. काळचक्राच्या या तुफानी दंगलीत कमल, तुझ्या माझ्या प्रेमाची न् प्राणाची जरी आहुती पडली तरी बेहत्तर, पण रूपमतीच्या निरीला हात घालू पहाणारा बनबीर बिलकूल जिवंत रहाता कामा नये. रहाणारच नाही तो.
(आत :- हमीराची गर्जना०- राजवाड्याचा चिरा न् चिरा अखडून बनबिराला हुडकून काढा. ससेहोलपट करा.)
कमल०--काय ऐकते मी हे? माझ्या बाबांची ससेहोलपट? राणाजी, बाबांच्या बचावासाठी मी एकटी तरी जाऊ का?
उदय०--तुला कुणी अटकाव केला आहे? खुशाल जा. बनबिराच्या बचावासाठी, त्याच्या कन्येनं खुशाला आपली सारी पुण्याई खर्ची घालावी.
कमल०--(स्व.) इकडं आड तिकडं विहीर झालंय मला. बापाच्या जिवासाठी धावू का जिवाच्या देवासाठी इथं राहू? (उ०) महाराज, माझा प्राण या पायांशी घुटमळत ठेवून, कमलची नुसती कुडी पित्याच्या बचावासाठी जात आहे. जाजू ना मी? जाऊ ना? (उदयसिंह तटस्थ. ती जाते.)
(कमला जात असतानाच, समोरून रक्ताने आग न् तलवार माखलेला हमीर त्वेषाने येतो.)
हमीर०--छोरी, खडी रहो. थांब. कुठे आहे तो सैतान बनबीर?
कमल०--मला नाही माहीत कोण तुमचा सैतान आहे तो. चल हो बाजूला. खबरदार मला अडवशील तर. बनबीर बिनबीर मी नाही ओळखत. मी माझ्या वडलांच्या बचावासाठी चाललेय. चल हो बाजूला. रानवट लाण्डगे मेले. (जाते.)
हमीर०--नाईक, या पोरीच्या पाळतीवर एक तुकडी रवाना करा, म्हजे त्या हरामखोराचा बिनचूक ठावठिकाणा लागेल. जा लवकर. पण राणा उदयसिंह कुठे आहे. राणाजी राणाजी....
उदय०--कोण? हमीर? हा मी इजिथं आहे.
हमीर०--(प्रणाम करतो) महाराज श्री एकलिंगजीच्या कृपेनं आणि आपल्या पायांच्या पुण्याईनं, आमची समशेर आतापर्यंत बिनधोक यशवंत झाली आहे.
उदय०--त्याचं सारं श्रेय तुम्हा दिल्दार दोस्ताना आहे माझ्या हातनं काय झालं? काहीच नाही.
हमीर०--महाराजानी असं बोलू नये. हा सारा या पायांच्या पुण्याईचा प्रताप.
उदय०--रणकंदनाची धुमाळी आता कोणत्या बाजूला चालली आहे? जयपाळ कुठे आहे?
हमीर०--जयपाळनं समशेरची न् धाडसाची आज शिकस्त केली. दक्षिण बुरुजाचा सुरुंग त्यानं जातीनं शिलगावला. तटबंदीच्या धडाड कोसळणीखालीच तो गारद व्हायचा, पण बिजलीसारखा निसटून बचावला. बोल बोलता गडावरच्या बनबिरी सैन्याच्या छावण्या एकाच हल्ल्यात खतम करून, जयपाळने आता खास राजवाडावर मोर्चा चढवलाय. बालेकिल्ल्यावर महाराजांचं प्राचीन सूर्याकितं निशाण फडकवून, आपला शोध करीत मी निकड आलो.
उदय०--बनबीर ठार झाला नाही, तोंवर या निशाणाचं काय महत्व हमीर. गडाखाली उत्तर बाजूला परमारांच्या सैन्याचा तळ येवून पडला आहे तो बनबिराच्या मदतीला धावला तर?
हमीर०--त्याची नको सरकारला काळजी. परमारानीच आम्हाला तोफांची न् दारूगोळ्याची भरपूर मदत दिल्यामुळेच आजचा मुकाबला इतक्या सफाईनं पार पाडता आला. (गुंडाळून आणलेली तलवार नजर करीत.) थोरल्या महाराजांची ही आवडती यशवंति, आपल्या हाती देण्यासाठी जयपाळानं मुद्दाम पाठवली आहे. तिचा स्वीकार व्हावा.
उदय०--(३ वेळा प्रणाम आणि चुंबन घेवून, संपर्कन् पाते बाहेर काढतो.) आहा. यशवति दिल्ली माळव्याच्या चांद ताऱ्याला तब्बल आठरा वेळा नेस्तनाबूद करणाऱ्या संगराजाची ही यशवंति. आता माझ्या हातात आली आहे. दोस्त हो, चला आता. चोहीकडून निकराचा हल्ला चढवून, या महिषासुर मर्दिनीला त्या बनबीर रेड्याच्या रक्तप्राशनानं इतकी बेहद्द बेताल बनवू का हिच्या ताण्डव नृत्याच्या दणदणाटानं, जगातल्या अत्याचारी मनोवृत्तीना कायमची दहशत बसली पाहिजे. बोला श्री एकलिंगजीकी जय.
(गर्जना करीत सारे जातात.)
(भेदरलेला कर्णपाल धापा टाकीत येतो.)
कर्ण०--( स्व०) अरेच्चा, इकडंहि धामधूम आणि तिकडं? तिकडं पण धामधूमध दंगल आग न् रक्तपात यानी सारा गडच खायला उठलाय. आता भी जाऊ कुठं, धावू कुठं, लपू कुठं न् छपू तरी कुठं? मोका तर मोठा बाका आला. (आत फैरी झडतात.) अरे बापरे. या धडेबाजीनं माझ्या काळजाचा धड हादरून हादरून तुटणारसा वाटतो. कचाकच कत्तल परवडली, पण ही बंदुका तोफांची धडाड़ धोम घडेबाजी मला बिलकुल पसंत नाही. हो. पण माझ्या पतीला आता कोण धूप घालणार... अरे बापरे. ही बंडाळीची वावटळ इकडंच रेटीत येऊ लागली. (आत:- राणा उदयसिंहाचा जयजयकार अशा गर्जना.) म्हणजे? बनबीर बुवांचा एळकोट उडाला वाटतं.... आं. बालेकिल्ल्यावर उदयसिंहाचं निशाणसुद्धा चढलं? खतम् मामला. आली रे आली. ही लगट इकडंच आली. आणि सगळ्यांच्या पुढं थैमान घालणारा.... हा शेन्दऱ्या सैतान कोण? अरे हा तर जयपाळ, राण्डलेकी अखेर बनबिरावरच उलटला आं? आपणहि आता केली पाहिजे पगडीपालट.
(आत- जय०-- घरा पकडा, बनबीर पक्षाचा सापडेल तो आसामी बेलाशक ठार करीत चला.)
कर्ण०--(स्व.) आता माझा पक्ष कोणता? बनबिराचे पुरते वाटोळे झाल्याची बातमी नाही आणि उदयसिंहाच्या उद्याची तरी हमी कोण देणार? लढाईत कुणाचं पारडं कसं वर खाली होईल, कुणी सांगावं? आपण आपलं पागडं आता नीट सांभाळलं पाहिजे खरं. शीर सलामत तर पगडी पचास (बार होतात.) आलाच की हा लोंढा इकडं. जीव बचावण्यासाठी पागडी-पालटापूर्वी जागेची थारेपालट केली पाहिजे. (पळून जातो.)
(जयपाल नि सैनिक त्वेषाने येतात.)
जयपाळ०--पकड़ा पकड़ा त्या हरामखोराला. बनबिराच्या प्रत्येक नीच करणीला हाच थेरडा चिथावणी देत असे. याचं नरडं दाबल्याशिवाय बनबिराचा पत्ता लागायचा नाही.
(शिपायी कर्णपालाला पकडून आणतात.)
जय०--लाळघोट्या थेरड्या पळून जातोस काय?
कर्ण०--पळून जाणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. कारण मी म्हातारा आहे. तरणा नाही.
जय०--कुठं आहे तुझा पोषिंदा बनबीर? काळाचा काळ म्हणून केवढा घमेंड. कुठं बसला आता तोंड काळं करून? बोल, जबाब देतोस का छाटू गर्दन?
कर्ण०--बनवीर माझ्या गर्दनीत थोडा लपून बसला आहे? या धामधुमीत माझा मीच बेपत्ता. बनबिराचा पत्ता मला काय माहीत? जयपाळ, अरे मी तुझ्या बापासारखा अन् माझी अशी विटंबना?
जय०--चूप रहा बेशरम. पलिते पेटवून उभा जाळल्याशिवाय तूं खरं सांगणार नाहीस.
कर्ण०--जयपाळ, ए जयपाळ, अरे माझे असे हाल काय रे करतोस? शरण आहे मी. शरण आला त्याला मरण देवू नये, असे शास्त्रात लिहलंय.
जय०--हे शस्त्र आत्ताचे शास्त्र आहे. खरा जबाब देशील तरच जिवानिशी सुटशील.
कर्ण०--अरे आपण एका बैठकीतले दोस्त.
जय०--तुझ्या दोस्तीची पर्वा त्या उन्मत्त बनबिराला. आम्हाला नाही, पेटवा रे पलिते... उडवा यांची पगडी. (शिपायी तसे करतात.) करा तिचा पलिता आणि पेटवा याला.
कर्ण०--(शिपायाना) अरे ए माणसानो, माणसाकडं तरी पहाल का नाही? माझी पगडी उडवलीत? हरकत नाही. शीर सलामत तर पगड्या पन्नास. बनबिराची पगडी गेली तर उदयसिंहाची चढवीन डोक्यावर आहे काय इतकं त्यात?
जय०--तुझ्या बेशरमपणाला काही सीमा आहे का रे थेरड्या?
कर्ण०--अरे बाबा, म्हातारपण हाच मुळी बेशरमपणाचा पक्का दाखला.
जय०--बस कर तुझी वटवट. बनबीर कुठं आहे ते सांग, नाहीतर, हो मरणाला तयार.
कर्ण०--म्हातारी माणसं मरणाला तयारच असतात जयपाळ. पण.. पण हे कन्दुरीचं मरण रे कशाला देतोस मला?
जय०--बनबीर रेड्याचा बळी घेण्यापूर्वी,तुझ्यासारखे लाळघोटे बोकड छाटून साफ केलेच पाहिजेत.
कर्ण०--मला पांढरी दाढी असली म्हणून मी बोकड काय रे जयपाळ?
जय०--बदमाषाप्रमाणं मरायचं नसेल, तर हो सामन्याला तयार. सोडा रे याला. उपस तुझी तलवार.
कर्ण०--तलवार उपसू? कशाला? अरे बाबा, ही माझी शोभेची तलवार आहे. चार पिढ्यात एकदासुद्धा चुकून कधि बाहेर काढली नाही. म्यानात पातं आहे का नुसती मूठच बसवली आहे. कुणाला माहीत?
जय०--क्षत्रिय म्हणवतोस आणि.....
कर्ण०--म्हणायला काय? हवा तो लुंगासुंगा क्षत्रीय म्हणून मिरवतो, पण क्षत्रियाचं कर्म थोडंच साधणार त्याला?
जय०--तुझ्यापाशी सलवार नसेल, तर ही घे. (शिपायाची तलवार देतो.)
कर्ण०--छेछे छेछे. हे पाप मला कशाला? मी आहे श्रीकृष्णाच्या घाटणीचा. न धरी शस्त्र करीं मी...
जय०--मग काय? गोष्टी सांगेन युक्तिच्या चार, एवढीच अक्कल.
कर्ण०--वकिलाचं भाण्डवल एवढंच.
जय०--माणुसकीला मुकलेल्या क्रियानष्ट कोल्ह्या,राणी रूपमति तुला मुलीसारखी. एका वेळची तुझी चक्रवर्तिनी स्वामिनी. तिच्यावर बलात्कार करण्याचा सल्ला बनबिराला, म्हाताऱ्या डुकरा तूंच दिलास ना?
कर्ण०--मी दिला? जयपाळ, अरे काय तोंड आहे म्हणून हवे ते बोलतोस? उन्मत्त सत्ताधाऱ्याना असल्या पापी गोष्टी काय सुचवाव्या लागतात? मी फक्त बनबिराच्या हो ला हो ठोकीत होतो. वारा वाहील तशी शिड फडफडवूनच समर्थांना नेहमी प्रसन्न ठेवण्यातच राजनिष्ठेचा धर्म असतो..
जय०--आग लाव तुझ्या राजनिष्ठेच्या धर्माला. नराधमा, चितोडच्या चार रियासतींचे तू कोळसे केलेस. पोट जाळण्यासाठी, हव्या त्या जबरदस्ताची पायताणं डोईवर नाचवून, देश धर्मावर निखारे ठेवलेस.
कर्ण०--घे बाबा, हवं ते बोलून घे. काळ फिरला का नांगराचा फाळ पण फिरतो,
जय०--(शिपायाना) जा या देशद्रोही कुतरड्याला सध्या काटेरी पिंजऱ्यात कोंडून ठेवा.
कर्ण०--ए ए ए जयपाळ, अरे मला तलवारीनं छाटून टाक, पण काटेरी पिंजरादाखवू नकोस रे. माझ्या पांढऱ्या केसांची तरी तुला दया येऊ दे रे.
जय०--तुझ्या अन्नदात्या बनबिराला मार आता हाका. तो तुझा राजा न् तूं त्याचा राजनिष्ठ खुषमस्कऱ्या.
कर्ण०--अरे बाबा, मला बनबीरच काय चाटायचा आहे? मी आपला समर्थाचा श्वान. कालपर्यन्त दिला सगळ्यानी मान, आज सापडली तुझ्या हातात माझी मान. कालपर्यन्त बनवबीर जबरदस्त होता, त्याचा जयजयकार केला. आज उदयसिंह जबरदस्त. त्याचा जयजयकार करीन. आत्ता करतो. राणा उदयसिंहकी जय
(आत:-राणा उदयसिंहको जय. हमीर०-तो पहा. हरामखोर बनबीर, उत्तरेकडच्या बुरुजावर सैन्याची जमवाजमव करीत आहे. चला, एकदम तिकडे मोर्चा फिरवा.)
जय०--(शिपायाना) जा याला काटेरी पिंजऱ्यात डांबून, एकदम उत्तर बुरुजाच्या हल्ल्यात सामील व्हा. (आत शिंगे वाजवतात) (जातो.)
कर्ण०--(शिपायी नेत असताना) आलिया भोगासी असावे सादर.
(सर्व जातात.)
(निराशेने संतापलेला बनवीर येतो)
बनबीर०--निमकहराम एकजात सारी दुनिया निमकहराम, जिकडे नजर टाकावी तिकडे विश्वासघात... घरभेद... फितुरी. ठीक आहे. माझे सैनिक फितले काय? ठीक आहे. जा. असल्या भाडोत्री शिपुरड्यांच्या पाठबळावर माझा राजकिरीट सावरून धरण्याची माझी मुळीच इच्छा नाही. मनगटाच्या मगदुरानं मिळविलेली माझी राज्यसत्ता, त्याच मनगटाच्या महशूर मर्दाईवर, मरणाने मला मिठी मारीतोंवर, मी खालसा होऊ देणार नाही. सारी दुनियाच जिथं मरणासाठी आलेली, तिथं, तब्बल सहा वर्षे उभा हिन्दुस्थान धाकाच्या टाचेखाली ठेचून ठेवणारा हा काळाचा काळ बनवीर, प्रतिस्पर्ध्यांच्या प्रचंड सेना-सागराशी प्रतिकाराची मुसण्डी मारताना, रसातळाला गेला तर त्यात आश्चर्य करण्यासारखं आहेच काय मुजी? माझ्या सत्तेच्या मदानंच, सैनिकांना नागरिकांना मदिरा प्राशनाची शिफारस केल्यामुळेच, या काळतोंड्या कटबाजांच्या कारवाईची कराल करवाल माझ्या नरड्याला भिडली. मंदिरा..... दारू.... अवदसे तुझ्या मोहक बहिरंगाला न् रुचकर घुटक्याला भाळून आजन्म मी तुझा सत्कार केला. जुगाऱ्याच्या माथेफिरूपणा प्रमाणं, मी तुझा अंकित झालो. तुझ्या प्राशनाच्या बेगुमान धुंदीनं बेहोष होऊन, रणांगणावर माझ्या समशेरीचं पाणी आजवर बिनचूक चमकल्यामुळे, राजकारणाची यशवन्ती म्हणून मी तुझी निस्सीम भक्ति केली. पण अखेर... मोहक चमकीच्या दाहक कवटाळणी, वैभवाच्या शिखरावर माझं अखेरचं पाऊल पडण्याच्या ऐन क्षणाला केवढा तूं माझा कडेलोट केलास? ठीक आहे. राजकारणी धोरणाचा डाव दारूच्या घोटानं हुकवला. बाजू अंगावर आली. आता माघार? जान गेली तरी कुछ परवा नही. जळत्या सत्तेच्या डोम्बाळ्यात मेरू पर्वतासारखा ताठ उभा राहून, माझ्या सिंहासनाची न् राजदण्डाची राखरांगोळी उघड्या डोळ्यांनी पाहीन, पण काळाचा काळ म्हणून दशदिग्भाग दणाणून सोडणा बनबिराच्या छातीच्या कोट, राज्यक्रांतीच्या धरणीकंपात रेसभर हादरला, असल्या बदलौकीकाचा बखरीतला चुटपुटता उल्लेखसुद्धा या बनबीर बहादराला परवडणार नाही.
(आत:- राणा उदयसिंहाचा जयजयकार, या गर्जना )
(सैनिकांसह जयपाळ येती.)
जयपाल०--याच बाजून तो हरामखोर पळाला.
बनबीर०--कोण? जयपाळ? विश्वासघातक्या, सापडलास शेवटी माझ्या तडाक्यात हरामखोरा.
जय०--कोण हरामखोर बनबीर हरामखोर, खुनी, दगाबाज. कुणाला सांगतोस हरामखोरीची पुराणं?
बन०--उलट्या काळजाच्या वटवाघळा, माझं अन्न खाऊन माझ्यावर उलटलास?
जय०--कुणाचं अन्न? तुझ्या बापाचं? बंद कर चोरा तुझी ही घमेंडखोर दमघाटी, चितोडच्या मिठाला बिनचूक जागलेला जयपाळ. हा पहा, तुझ्या तोंडावर तुझा धि:कार करीत आहे. चल हो सामन्याला तयार.
बन०--तुझ्याशी सामना? बनबिराशी सामन्याची मगरूर भाषा करण्यापूर्वी चिलटा तुझ्या नालायकीचा विचार कर. माझ्या हुजऱ्याची ज्याला खेटरानी तुडवावा, त्याला माझ्या सामन्याचा मान? चल हट् कुतरड्या.
जय०--तुझे दरबारी, हुजरे नि खुषामत्ये.... तुझ्या पुढच्या तैनातीसाठी केव्हाच झाले रवाना नरकाला. बालेकिल्ल्यावर फडफडणाऱ्या त्या केशरिया निशाणावर नजर टाक.
बन०--त्या दिडदमडीच्या फडक्याचा दिमाख तुला. असली रंगीबेरंगी फडकी फडफडवून, राज्यप्राप्तीचे मुकाबले फडशा पडते, तर गावोगावचे परीट नि रंगारी घरोघर दिल्लीची पातशाही निर्माण करते. दगडमातीच्या बुरुजावर झेण्डे नाचवणान्या नामर्दांनो, बनबिराच्या छातीचा कोट फुटेपर्यन्त, मेवाडच्या मातीच्या कणावर सत्ता सांगायची कृतान्त काळाची छाती नाही, तर तुम्हा माकडाना रे कोण विचारतो?
(आत:- राणा उदयसिहाचा जयजयकार.)
जय०--बनवीर, तुझ्या काळाची ही काळगर्जना नीट ऐक. तुझ्या अगणित पापांनी उठवलेल्या पिशाच्चाच्या या वावटळीत, कुत्र्याच्या मोतानं मरण्यापेक्षा, उदयसिंहाच्या फाटक्या पायतणाच्या किंमतीच्या या त्याच्या सेवकाच्या हातूनं, धारातीर्थी मरणाचं पुण्य तरी पदरात पाडून घे.
बन०--असल्या भूत वेताळ पिशाच्चाच्या वावटळी पैजाराखाली ठेवायला हा बनबीर खडा तयार आहे.
(आत:- राणा मुदयसिंहाचा जयजयकार.)
बन०--(तुच्छतेने खोखो हासत) माझ्या हुकमाने गर्दनछाट झालेल्या त्या पोरट्याचा जयजयकार? (बिकट हास्याचा खोकाट करतो.)
(हमीर सैनिकांसह येथून बनबिराला गराडा घालतो जयजयकार.)
बन०--कुठंय तुमचा उदयसिंह, तर त्याचा एवढा मोठा जयजयकार करता? भ्रमिष्ट माकडानं, माझ्या हुकमानं गर्दनछाट होऊन तो केव्हाच झाला नरकाच्या वाटेला रवाना. (विकट हास्य. )
(उदयसिंह येतो.)
उदय०--उदयसिंह गर्दनघाट? उदयसिंह गर्दनछाट झाला, तर बनबिराची गर्दनछाट कत्तल कोण करणार?
बन०--(आपादमस्तक न्याहाळीत) आस्स. ठीक. अखेर तरी तू माझ्या सामन्याला आलास.
उदय०--विक्रमाजिताच्या खुनाचा सूड त्याच्या पुत्रानंच घेतला पाहिजे. उघडउघड सामना मर्दानं द्यावा नि तुझ्यासारख्या भेकड पापाधम घुबडानी मारेक-याच्या नथणीतूनं तीर मारावा.
बन०--तोडच्या वल्गना आता बंद कर.
उदय०--ठीक. चल हो सामन्याला तयार आजवरच्या सत्तेच्या न् सामर्थ्याच्या वल्गना नीट कसाला लावून घे. हा घे पहिला मुजरा.
बन०--तूं एकटा माझ्याशी लढणार, का या सगळ्या माकडाना घेवून सामना देणार? दोनीही गोष्टीना माझी तयारी आहे.
उदय०--तुझ्यासारख्या चिलटाला चिरडायला हे सैनिक कशाला? चला, व्हा रे बाजूला. (सैनिक दूर होतात.) बनवीर, सैतानी सत्तेचा सत्यानाश होऊन,न्यायी परमेश्वराचा अंमला आता चालू झाला आहे.
बन०--जहान्नम्मे गया परमेसर. ही घे माझी उलट सलामी
(जयपाल, हमीर सैनिक, श्री एकलिंगेश्वर की जय गर्जना करतात.)
(बनबीर आणि उदयसिंह यांची ढाल तलवारीची लढत, जयजयकाराच्या गर्जना, रणवाद्यांचा कडकडाट. एकमेकांचे सफाईदार हात पाहून, वाहवा, शाब्बास, जीते रहो पठ्ठे, असे बन० आणि उदय० एकमेकाना म्हणतात. दोघेही अवसानाने लढत असताना--)
उदय०--बनबीर, देख ले. उदयसिंहकी आखरी करामात. (वार जिव्हारी लागून बनवीर खाली कोसळतो.)
बन०--हा... आखरी करामात का.. री... ग.... र. (निश्चल पडतो. )
उदय०--(त्याला तपासून) (मुजरा करतो) खलास. दोस्तहो, अत्याचारी जुलूमशाहीचं उच्चाटन होऊन, मेवाडचा उध्दार झाला. जा. एकदम लढाईच्या तहकुबीची नौबद ठोका. गडावर ठिकठिकाणी होळ्या पेटवून, चितोड स्वतंत्र झाल्याचा डंका मेवाडवर जाहीर करा.
सर्वजण०--चितोडेश्वर राणा उदयसिंहाचा जयजयकार.
बन०--(सावध होवून उठण्याची धडपड करतो.) माझा दुस्मन् चितोडेश्वर?
सर्वजण०--अरेच्चा, हा साप अजून जिवंत आहे.
बनवीर०--( कण्हत वळवळत) नाही नाही. माझा प्राण जाईतोंवर चितोडचा अधिपती हा बनबीर आहे.
उदय०--(त्याच्या छातीवर पाय देवून) राक्षसा, तुला अजूनहि लढायची खुमखुम आहे?
बन०--बेषक क्यों नहि? बचेंगे तो औरभि लड़ेंगे.
उदय०--मरणाच्या दारात पाऊल ठेवणाऱ्या पामरा, मारताना तरी पश्चाताप कर..... पतित पावन परमेश्वर तुझ्या पातकाची क्षमा करील.
बन०--पश्चात्ताप? पश्चात्ताप नामर्दांनी करावा. नाही, नाही, दुसमन् उदयसिंह, दे दे माझी तलवार दे परत. अन् रहा सामन्याला उभा, पण तलवार कशाला? (कमरेचा खंजीर काढतो.) तुझ्या रक्तानं माखलेल्या हातानी रूपमतीची निरी हासडल्याशिवाय.....
उदय०--(खंजीर हिसकावून त्याच्या छातीत खुपसतो. ) हा घे रूपमतीच्या निरीचा हासडा.
बनवीर०--(बनबीर झिंदाबाद.. बनबीर झिंदाबा....द.. (मरतो.)
जयपाळ०--दुष्टांचं मरण त्यांच्या दुष्टपणाच्या हत्यारातच असतं म्हणतात ते काही खोटं नाही. यशवंतीच्या हातूनं मर्दाचं मरण पत्करण्यापेक्षा, या नराधमाचं मरण त्याच्या त्या खुनी खंजिरातच होतं.
उदय०--दोस्तहो, तुमच्या सगळ्यांच्या श्रमाचं आज सार्थक झाल.
हमीर०--ही सगळी प्रभूच्या पायांची पुण्याई.
जयपाळ०--राणाजींची प्रतिज्ञा यशवंत झाली.... पण हे काय? महाराज, आपण असे एकाकी खिन्न कां?
उदय०--दोस्तहो, बनबिराला ठार मारून मी माझी प्रतिज्ञा पुरी केली खरी, पण
सर्वजण०--पण काय?
उदय०--निदान कमलदेवीसाठी तरी आजचा हा प्रसंग......
(शोकाकुल कमलादेवी येते.)
कमलदेवी०--टाळता आला असता... तर नसतो काहो बरं झालं. (बनबिराच्या प्रेताला कवटाळीत) बाबा बाबा, आता या अफाट जगात या अभागी कमलला कुणाचा हो आधार न् आसरा.
जय०--(तिला सावरीत) राजकन्ये, हे भवितव्य ठरलेलंच होतं, तिथं कुणाचा काय इलाज? सत्ताधाऱ्यांची जुलूम जबरदस्ती कडेलोटाला गेली का त्यांची कण्ठस्नानाने अशीच अखेर करावी लागते. देवीनी पितृप्रेमाची मात्र कमाल शिकस्त केली. पोटची पोर कुणावर इतकी भक्ति करणार नाही, देवीनी भविष्याची काळजी करू नये.
कमल०--(उदयला) विजयी महाराज, मी आपली गुलाम बटिक बनले. अखेर आपणच आपला बोल खरा केलात ना? आता कशाला हे अश्रू न् आसवे?
जय०--देवी, बनवीर आपला काही जन्मदाता पिता नव्हता.
कमल०--बाप-लेखाच्या नि मायलेकीच्या प्रेमासाठी जन्माची पुण्याई लागतेच, असा काही नियम नाही. माझे बाबा कित्ति प्रेमळ होते. एका शब्दानं त्यांनी कधि मला दुखवलं नाही. का माझा शब्द खाली पडू दिला नाही.
उदय०--कमलदेवी बनबिराची राजकन्या नव्हेच तर?
कमल०--खरंच. भलत्याच तरुणीला प्रेमाचं आश्वासन देवून, महाराज, आपण आपल्या कुलवतपणाला कलंक लावलात.
जय०--(चितोडाधिपतीकडून अशी चूक कधीच झालेली नाही. कमलादेवी तुझा पिता... हा पहा.... पराक्रमी हमीर इथंच आहे.
कमल०--लढाईच्या धामधुमीत बायको मुलीला नशिबाच्या वाऱ्यावर झुगारून त्या धुमाळीत जो गडप झाला, त्याला काय बाप म्हणायचं? माझे बाबा बनबीरच. बाबा...
जय०--कमल, तुझ्या प्रेमानंच चितोडला आज हा भाग्याचा दिवस दिसला, तूं आपल्या प्रेमानंच नाही का महाराणी मातोश्रींचा बंदिवास सुखाचा केलास? हमिराने—तुझ्या पित्याने—घरादाराचा मोह सोडून, वनवास पत्करला नसता, आणि राणाजींच्या पाठीवर सावलीसारखा रानोमाळ भटकला नसता, तर चितोडला उदयसिंहाचे दर्शन तरी झाले असते काय? आणि तूं तर राजकुमाराला आजच्या एकाच रात्रीत या काळाच्या जबड्यातूनं दोनदा प्राणदान दिलंस.
कमल०--विजयी महाराज, बनबिराच्या छातीचा ठाव घेणारा तो खंजीर क्षणभर माझ्या हाती द्याल काय?
जय०--तुझ्या हाती नाही, माझ्या हाती. महाराज, आणा पाहू तो खंजीर इकडं (घेतो.) वेडे पोरी, तूं तर आम्हा सगळ्यांची यशवन्ती. तुला पाहिल म्हंजे आम्हा सगळ्यांना पन्नाची आठवण होते. तूंच जर राजकुमारावर आपल्या प्रेमाची ढाल आढवी धरली नसतीस, तर आजचा हा चितोड-मुक्तीचा दिवस उगवलाच नसता. चल. पूस ती आसवं... राणाजी, या असे पुढे कमलदेवी. तूं पण ये. महाराणी रूपमतीच्या आज्ञेप्रमाणे, या खंजिराला माखलेला बनबिराच्या रक्ताचा टिळा मी तुमच्या दोघाच्या कपाळी लावून, मेवाडाधीश्वर महाराज नि महाराणी म्हणून आपला हाच राज्याभिषेक करीत आहे.
(सगळीकडून गर्जना : चितोडेश्वर राणा उदयसिंहाचा जयजयकार.
चितोडसम्राज्ञी कमलदेवीचा जयजयकार. शिंगे, तुताऱ्या, नौबदी वाजवतात.)
हमीर०-- हा पहा सूर्यनारायण उदयाचलावर आला.
उदय०--उगवत्या सूर्यनारायणाची आजच्या राज्यक्रांतीवर अखंड प्रकाशाची कृपा असो.
(जयजयकारात नाटकाची समाप्ती)
००० ००० ०००
अंक पाचवा समाप्त.
२७ जुलै १९५३ या तारखेला सापडले.