जुन्या आठवणी
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
पहिल्या आवृत्तीविषयी
प्रबोधनकार केशव सीतासाम ठाकरे
यानी
`लोकमान्य` दैनिकातून सांगितलेल्या
जुन्या आठवणी
`ठाकरे सत्कार समिति, दादर` च्या सौजन्याने प्रकाशित झालेले पुस्तक.
प्रकाशन तारीख : १८ दिसंबर १९४८
मुद्रक : शांताराम नारायण सापळे,
नवयुग प्रिंटिंग प्रेस, पोर्तुगीज चर्च, दादर, मुंबई- १४.
या पुस्तकासंबंधी सर्व प्रकारचे हक्क माझ्या स्वाधीन आहेत. या पुस्तकाचा संदर्भ दर्शऊन यातल्या मजकुराचा लेखकांनी संदर्भासाठी उपयोग केल्यास माझी हरकत नाही.
- केशव सीताराम ठाकरे
पेपर परमिट
नं. 65/46943/|||
ता. १० नवंबर १९४८
प्रकाशक : केशव सीताराम ठाकरे
जोशी बिल्डिंग, रानडे रोड एक्सटेन्शन, मुंबई नं. २८
ठाकरे सत्कार समितीचे निवेदन
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या एकसष्टीनिमित्त त्यांचा गौरव करण्यासाठी ज्ञातींतील २५-३० संस्थांनी एक सत्कार समिति स्थापन केली आणि तिने ता. १६ आक्टोबर १९४५ रोजी दसऱ्याच्या दिवशी प्राचार्य त्रिंबकराव आप्पाजी कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखालीं हा समारंभ थाटाने साजरा केला. या समारंभांत अनेक इतर ज्ञातीय पुढारी व स्थानिक सार्वजनीक संस्थांनीहि भाग घेतला होता. पूर्वी प्रबोधनांत प्रसिद्ध झालेले ठाकरेविरचित स्फूर्तिदायक पोवाडे आणि लेखांतील समयोचित उतारे मुलांमुलीनी म्हणून दाखविले. मंडपांत ठळक प्रबोधन-सूक्तींचे फलक जागोजाग लावण्यात आले होते.
कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले, “प्रबोधनकार माझे गुरु तर खरेच पण मी त्याना वडिलांप्रमाणे पूज्य नि पूजनीय मानतो. ठाकरे मुंबईला रहात असले तरी मुंबई ही त्यांची कर्मभूमि नव्हे. त्यांची कर्मभूमि सातारा जिल्हा.’’ प्राचार्य दोंदे म्हणाले, "प्रबोधनकारांचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यांची बेडर वृत्ति". अणजूरकर गजानन गोविंद नाईक म्हणाले, "क्रांति मर्दाची नि शांती मुर्द्याची या प्रबोधन सूक्तीतच ठाकरे यांचे सारे वाङ्मयीन जीवन चित्रित झालेले आहे.”
सत्कार समितीच्या वतीने प्रबोधनकाराना एका उंची फौण्टन पेनचा आहेर करताना स्वागताध्यक्ष महाशय विश्वनाथराव कोतवाल म्हणाले, “झुळझुळत्या लेखनाचा हा जिवंत झरा, ओजस्वी वाङ्मयाची ही जागती ज्योत, गडकऱ्यांची कलमेश्वरी, प्रबोधनकारांच्या प्रभावी लेखणीचे प्रतिक म्हणून त्याना प्रेमादराने अर्पण केली आहे."
याच वेळी ठाकरे वाङ्मयांचे पुनर्मुद्रण करण्याची योजना पुकारण्यात आली व स्वयंस्फूर्त देणग्यांच्या बरोबरीने निधि जमा करण्यासाठी, तमाम महाराष्ट्रांत गाजलेल्या ‘खरा ब्राह्मण’ नाटकाचा प्रयोग महाशय नंदू खोटे यांच्या विख्यात रेडिओ स्टार्स नाट्यसंस्थेने दादर येथे ता. २५ मे १९४६ रोजी श्रीनंद नाट्यगृहात केला. अध्यक्षस्थानी मेहेरबान जमशेटजी बी. एच. वाडिया, एम्. ए. एल्एल. बी., एम. बी. ई., बॉम्बे रेनेसां असोसिएशनचे अध्यक्ष होते. स्वराज्यमंत्री महाशय गोविंदरावजी वर्तक अगत्याने आले होते.
‘जनापवाद सोसूनहि आपण समाज सुधारण्यासाठी, विशेषतः अस्पृश्यता निवारणासाठी जे प्रयत्न केले, त्याबद्दल आपणास धन्यवाद” असा पंतप्रधान बाळासाहेब खेर यानी संदेश पाठवला. प्रबोधनकारांच्या ४० वर्षांच्या विचारक्रांतिकारक लेखन व्याख्यानांचा आढावा घेताना, अध्यक्ष वाडिया शेटजी म्हणाले,
"So powerful must have been the impact of articles written with a pen of steel in the ink of fire that the writer (Mr. Thackeray) came to be known throughout the length and breadth of the world of Maharashtrian literature as "Prabodhankar Thakare If in Mahatma Eknath, Thackeray gives us the "Khara Brahman (खरा ब्राह्मण) then in Thackeray himself we have the "Khara Manushya (खरा मनुष्य) the homo sapient.
प्रबोधनातील प्रबंध चिरकालिक महत्त्वाचे आहेत. ते ग्रंथरूपाने प्रसिद्ध व्हावे, असा महाराष्ट्रातील अनेक साहित्य-पंडितांचा आग्रह फार जुना आहे. सत्कार समितीने या दिशेने पहिले पाऊल टाकावे, ही मनिषा. पण युद्धजन्य परिस्थितीने छपाईचे नि कागदांचे प्रश्न अधिकाधिक बिकट केले.
इतक्यात प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापूजी हा साडेसहाशे पानांचा रोमांचकारी सचित्र इतिहास ग्रंथ लिहून प्रबोधनकारानी प्रकाशात आणला (सन १९४७) आणि वयोमानाने जरी आपण वृद्ध झालो तरी सत्यशोधनांची आपली तिरमिरी तगडी जवान आहे, हे त्यानी सिद्ध केले. अखेर, लोकमान्य दैनिकांत प्रसिद्ध होऊन लोकमान्य ठरलेल्या त्यांच्या `जुन्या आठवणी`चे पुस्तक सत्कार समिति प्रबोधन भक्ताना नि महाराष्ट्रीय रसिकाना अत्यादराने सादर करीत आहे.
महाराष्ट्रीय रसिकाना अत्यादराने सादर करीत आहे.
देणग्या नि नाट्यप्रयोगाचे उत्पन्न एकंदर रु. २५०२-११-०, असा निधि जमला नि तितकाच सत्कार समारंभ, नाट्यप्रयोगाचा खर्च आणि या पुस्तकाची छपाई यांत खर्च झाला. मुंबई सरकारने नाट्यप्रयोगावरील कर माफ करून समितीवर मोठे उपकार केले आहेत, त्याचप्रमाणे लहान मोठ्या रोख देणग्या देऊन अनेक ठाकरे-भक्तानी समितीला सहाय केले आहे. कृतज्ञतेने त्यांचे जाहीर आभार समिति येथे मानीत आहे. काही ठळक देणग्या-
श्री. दत्तात्रेय रामचंद्र देशमुख, घाटकोपर : रु.२१०
श्री. गोविंद काशीनाथ चित्रे, जळगांव : रु.१०१
चां. का. प्रभू सभा, दादर : रु.१५०
चां. का. प्र. को. क्रेडिट बँक, दादर : रु. १०१
धक्का क्लब दादर (ठाकरे याना, रोख) : रु.१२९-१२-०
लोकमान्य दैनिकाचे विद्वान संपादक महाशय पां. वा. गाडगीळ यानी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिल्यामुळें, समितीला आणखी विशेष काही सांगायचे नाही, सर्व सहायकांचे आम्ही आभारी आहो.
वि. दा. कोतवाल, कार्याध्यक्ष
वि. अ. ताम्हाणे, खजिनदार
ना. गो. तवकर,
म. वि. प्रधान (३१ मे १९४६ पर्यंत)
प्र. वि. नाचणे
ज. आ. देशपांडे
(१ जून १९४६ पासून) चिटणीस
सभासद
वि. गं. मोकाशी
कै. गो. वि. दिघे
रा. ना. वैद्य
शां. बा. कुळकर्णी
व. आ. प्रधान
हिशेब तपासनीस.
रा. म. कर्णिक
ज. प्र. कर्णिक
ता. १८ दिसेंबर १९४८
(ठाकरे सत्कार समिती कार्यालय)
१००, शिवाजी बाग, शांतिलता,
मुंबई नं. २८.
अर्पण पत्रिका
दादरचे नेत्रशास्त्रज्ञ शस्त्रवैद्य डॉ. श्रीधर विठ्ठल ओक, एम.बी.बी.एस.
यांना
ही वीस आठवणींची फुलांची ओंझळ कृतज्ञ भावनेने अर्पण असो.
आक्टोबर १९४१ चा पहिला आठवडा. एका दिवशी सकाळी झोपून उठतो तो काय विलक्षण चमत्कार घडला. माझी दृष्टी अज्जीबात गेलेली. मी आंधळा झालो. काही केल्या काही दिसेच ना! अखंड लेखन वाचन हे तर माझे सारे जीवन, आंधळा झालो, जिवंत असून मरणाचीच ती दशा! काल रात्री दीड वाजेपर्यंत वाचन चालू होते. आणि सकाळी? दृष्टी गेली! सारी सृष्टी मला मेली!
चित्रकार चिरंजीव बाळ याने हात धरून संध्याकाळी डॉ. ओक यांच्या दवाखान्यात नेले. डॉ. ओकांचा माझा ऋणानुबंध फार जुना नि जिव्हाळ्याचा. त्यांचे वडील बंधू अमेरिका-निवासी चि. विष्णुपंत यांचे कॉलेजातले अध्ययन माझ्या देखरेखीखाली झाले आणि त्यांच्या विविध सार्वजनिक चळवळी माझ्याच कदरीखाली त्यानी केल्या. डॉ. ओकानी डोळ्यांच्या बुबुळात इंजेक्शने देऊन दीड महिन्यात मला दृष्टी येऊन सृष्टीचे पुन्हा दर्शन घडवले. मला नवा जन्मच दिला म्हणा ना. जुन्या आठवणीचे हे पुस्तक त्या क्रांतिकारी घटनेच्या आठवणीसाठी, कृतज्ञतेचे एक बारीकसे पारिजातकाचे म्हणून, डॉ. ओकाशिवाय मी कोणाला वहावे?
- केशव सीताराम ठाकरे
****
प्रस्तावना
प्रसिद्ध साहित्यिक, सुधारक आणि इतिहास-संशोधक श्री. केशवराव ठाकरे यांच्या या वीस आठवणी आहेत आणि शिवाय बर्मा टाईमवर विचार व्यक्त करणारा `नवशक्ती`त आलेला एक चिकित्सक लेख आहे. शेवटच्या तीन आठवणी नवीन व अप्रसिद्ध आहेत आणि सतरा आठवणी `लोकमान्य` दैनिकांत प्रसिद्ध झालेल्या आहेत.
ठाकरे हे चांगले शैलीवंत साहित्यिक आहेत. प्रतिपक्षावर टीका करतांना अथवा प्रतिपक्षाची टीका उलटवितांना त्यांचे लेखन मुद्देसूद असून मोठे प्रहारी असते. ठाकरे यांच्यावर अनेकांनी लेखणीचे तडाखे दिले आहेत व ठाकऱ्यांनीहि अनेकांना लोळविले आहे. ते टवाळीत उपरोध फार निष्ठुरपणे करतात. पण त्यांच्या लेखणीत कुजकेपणा नसून खेळकरपणा व हांसरेपणा आहे. त्यांचे अंतःकरण स्वच्छ व प्रेमळ असून, त्यांच्या खट्याळ लेखनांतहि एक प्रकारचे औदार्य आहे. ठाकरे यांचे वाङ्मय ज्यांनी वाचले आहे त्यांना त्यांच्या केवढ्याहि थोड्या लेखनांत वरील गुण दोष दिसून येतात.
ठाकरे यांच्या लेखनासंबंधाने माझे वर दिलेले मत मी केव्हांतरी एकदा `प्रबोधन`च्या फायली चाळल्या त्यावरून बनलेले आहे. म्हणून श्री. ठाकरे यांची पहिली आठवण `लोकमान्यां`त छापण्यासाठी मजकडे आली व आणखी आठवणी येणार असा संभव दिसला, तेव्हां फार दिवस वांचकांपासून दूर राहीलेले ठाकरे पुन्हा वाचकांपुढे आले म्हणून मला आनंद वाटला. तरी हा मारकट लेखक पुन्हा कोणकोणाला शिंगे मारून महाराष्ट्रांत नवी कोणती भांडणे माजविणार की काय, अशी मला भीति वाटली, भांडण म्हटले म्हणजे मला शिसारी येते. आम्ही महाराष्ट्रीय लेखकांनी भांडणे उकरून व माजवून महाराष्ट्रांचे जेवढे नुकसान केलें आहे तेवढे दुसरें कशानेहि झाले नसेल. म्हणून ठाकरे यांचा लेख समोर येतांच मी बिचकलों! पण लेख वाचून पाहिला तो अगदीच वेगळ्या प्रकारचा आढळला. तर वर्णन केलेल्या गुणदोषांतले गुण सारे यांत आहेत, पण दोष मुळीच नाहीत.
आठवणी हा वाङ्मय प्रकार मराठीला नवा नव्हे. पण आठवणी कितीहि नम्रपणे लिहिलेल्या असल्या तरी त्यांत खुशामत, अहंकार, व्यक्त व अव्यक्त द्वेष, लुब्रेपणा, प्रौढी वगैरे काही ना काही असायचेच अशी रीत आहे. अशा आठवणी-संग्रहांचे उल्लेख करून मी येथे कोणाची निंदा करू इच्छीत नाही. कोणाची केवळ तात्विक मते सांगण्यासाठी लिहिलेल्या आठवणी या पुष्कळदां जड अभ्यासाचे तात्विक प्रबंध असतात, ठाकरे यांच्या या आठवणी रूढ प्रकारांहून अगदी वेगळ्या आहेत. अनेक महत्वाच्या व किरकोळ घटना त्यांनी दुरून व जवळून पाहिल्या आणि त्या त्यांनी अतिशय लीलेने पण मार्मिकतेनें लिहून काढल्या आहेत. त्यांत विषय साधे आहेत. मोठ्या माणसांच्या साध्या गोष्टी आहेत आणि त्या साध्या गोष्टींतहि मोठ्यांचे मोठेपण उठावदारपणे रेखाटलेले आहे.
फेरोजशहा, रानडे, विष्णुबुवा पलुस्कर, काशीनाथपंत छत्रे वगैरे प्रसिद्ध थोर पुरुषांचे बाणेदार व्यक्तित्व ठाकरे यांनी अगदी उत्कृष्टपणे दाखविले आहे. जनुभाऊ निंबकर, केशवराव भोसले, कृष्णराव गोरे वगैरेबद्दलच्या आठवणी मराठी नाट्यसृष्टीचे विस्मृत वैभव सूचित करीत आहेत. `सखूबाईची खानावळ` हा महाराष्ट्रांतील सामान्य लोकांत दिसून येणाऱ्या ध्येयनिष्ठेचा अत्युत्कृष्ट नमुना आहे.
ज्यानी ठाकरे यांचे `प्रबोधन` वाङ्मय वाचले असेल, त्यांना ठाकरे यांच्या या आठवणींच्या रूपाने अगदी नवी ओळख होणार असून, मराठी वाङ्मयांत आठवणी वाङ्मयाच्या एका आकर्षक प्रकाराची भर पडणार आहे. यांतील लेखनांत वक्तुत्व आहे. गोष्टी चटकदारपणे व बोधप्रदतेने कशा सांगाव्या याचा हा आदर्श आहे, असे मला वाटते.
पां. वा. गाडगीळ,
संपादक लोकमान्य
ता. २३ – ११ - १९४८
एक अभिप्राय
प्रबोधनकार श्री. ठाकरे ह्यांच्या ह्या आठवणी वाचून मला कवि माधव केशव काटदरे ह्यांच्या
देखावे गतकालचे निशिदिनी दृष्टीपुढे नाचती
त्या माजीं नयनां असंख्य दिसती छायामयी आकृती;
कांही निद्रित भासती क्षितितलीं कांहीं उभ्या निश्चल,
ज्या व्यक्ती इतिहासवास करिती त्या मात्र येथे चल.
ह्या उक्तीचें प्रत्यंतर अनुभवण्यास मिळाले. श्री. ठाकरे यांची वैयक्तिक मते कांहींही असोत. ती कोणास रुचोत वा न रुचोत; पण ह्या आठवणी मात्र अत्यंत रुचकर व समाजहितास सर्वस्वीं पोषक आहेत. इतकेंच नव्हे तर त्या वैयक्तिक असूनसुद्धां सामाजिक मोलाच्या कसोटीस उतरतील अशाच आहेत. कारण त्यांत श्री. ठाकरे यांनी व्यक्तिविशेषांचे फार मार्मिक रसग्रहण केले आहे.
निवडलेले प्रसंग औत्सुक्य निर्माण करणारे असून, ते ज्या भाषेत सांगितले आहेत ती भाषा घरगुती आणि गंभीर तितकीच विनोदी आहे. कुठलीही आठवण पहा. `आणखी लेखकांने कां बरे लिहिले नाही? इतकेच कां?` असे वाचकास वाटते.
हेच ह्या `छोट्या` पुस्तकांचे खरे यश. दुसरे म्हणजे श्री ठाकऱ्यांचे हे अनुभव केवळ व्यक्तीचे अनुभव म्हणून आतां राहिलेले नाहीत. ते सार्वजनिक अनुभव म्हणून झाले आहेत. अशा सार्वजनिक आठवणींचे लेखक आपल्याकडे थोडेच आहेत. श्री. ठाकरे ह्यांच्याकडून अशा साहित्याचीच जनतेने सक्तीने मागणी केली पाहिजे.
दुर्गा भागवत [M.A.]
जव्हेरी व्हिला, गिल्डर लेन, मुंबई ८
आठवण १ ली
ता. १ सप्टेंबर १९४२, मंगळवार
"खबरदार मुंबई टाईम बदलाल तर"
-सर फिरोजशहा मेथा
स्टॅण्डर्ड टाइम चालू होण्यापूर्वी मुंबईमध्ये मद्रास आणि मुंबई अशी दोन टाइमे चालू होती. सूर्योदयाबरोबर घड्याळे लावण्याच्या प्रघातामुळे आणि मुंबईपेक्षा मद्रास पूर्वेकडे असल्यामुळे, तिकडे तो अर्धा तास लवकर होत असतो. सहाजिकच मद्रास टाइम मुंबईपेक्षा अर्धा तास पुढे असे. काही सरकारी कचेऱ्या आणि व्यापारी कंपन्या मुंबई टाइम पाळीत, तर काही मद्रास टाइम पाळीत ज्याच्या कचेरीचा जसा प्रघात तसा तो आपल्या घरातले घड्याळ मद्रास किंवा मुंबई टाइमाचे ठेवीत असे.
सन १९०६ साली जेव्हा स्टॅण्डर्ड टाइमाचा बूट निघाला, तेव्हा सर फिरोजशा मेथा यांनी त्याला निकराचा विरोध केला आणि मुंबई म्युनिसिपालिटीपुरते तरी मुंबई टाइम कायम ठेवण्याचा निश्चय केला. ज्या दिवशी स्टॅण्डर्ड टाइम चालू झाले. त्या दिवशी मुंबईचे गव्हर्नरसाहेब घोड्याच्या गाडीत बसून (कारण त्या वेळी मोटारी नव्हत्या) सार्वजनिक घड्याळे तपासण्याला अगदी सकाळीच बाहेर पडले. क्रॉफर्ड मार्केटपाशी येताच तेथले मनोऱ्यावरचे घड्याळ पहाताच तो जुने मुंबई टाइमावर चाललेले! गाडी थांबवून साहेब बहादुरानी ते घड्याळ स्टॅण्डर्ड टाइमाप्रमाणे ३९ मिनिटे पुढे सारण्याचा हुकूम दिला आणि म्युनिसिपालटीच्या नोकरानी काटे पुढे ढकलले.
मागाहून पाठोपाठ सर फिरोजशा मेथांची गाडी तेथे आली क्रॉफर्ड मार्केट पा पहातात तो ते ३९ मिनिटे पुढे ढकललेले! मेथांचा क्रोधाग्नि भडकला. त्यानी तेथल्या नोकराना जाब विचारला. नामदार गव्हर्नर साहेबांच्या आज्ञेने आम्ही तसे केले. असे त्यांनी सांगितले. सर फिरोजा दरडावून गरजले. "तुम्ही नोकर म्युनिसिपालटीचे का? म्युनिसिपालटीच्या मालकीच्या संस्थांची घड्याळे बदलण्याचा गव्हर्नराला काय अधिकार? मुंबई टाइम मुंबईचे टाइम आहे. प्राण गेला तरी मी ते बदलू देणार नाही. चला ओढा काटे मागे, खबरदार मुंबई टाइम बदलाल तर" ताबडतोब फिरोजशानी आपल्या समक्ष घडाळ्याचे काटे मागे खेचवले.
दुपारी कॉर्पोरेशनच्या सभेत फिरोजशानी जळजळीत भाषण करून मुंबई टाइम कायम ठेवण्याचा लोकमताचा ठराव पसार करून घेतला. त्यावेळी सर फिरोजशा म्हणाले. "आमचे आमच्याकडच्या सूर्योदयावर आहे. समुद्राच्या ओहट्यासुद्धा सगळी रयत याच टाइभावरून असते. शिवाय ते टाइम आहे. अभिमान आम्ही मुंबईकरांनी अभंग बाळगला पाहिजे, सरकारला काय! त्यांच्या सोयीसाठी उद्या ते हे नवे स्टॅण्डर्ड टाइमसुद्धा बदलतील. म्हणून काय, आम्हीही त्यांच्याबरोबर नाचानाच करावी? अशक्य, फिरोजशा जिवंत असेपर्यन्त तरी मुंबई टाइम बदलणार नाही."
आणि खरोखरच मुंबई म्युनिसिपालटीत मुंबई टाइम अभंग राहिले. मुंबई टाइम हे जसे मुंबईच्या स्वाभिमानाचे प्रतिक आहे. तसे ते सर फिरोजशा मेथा यांचेही स्मारक आहे.
मुंबई विरुद्ध स्टॅण्डर्ड टाइमाच्या मेथा प्रकरणावर मुंबईच्या `हिंदी पंच` अँग्लो गुजराथी सचित्र साप्ताहिकाने अंक विनोदी चित्र काढले होते. क्रॉफर्ड मार्केटच्या मनोऱ्यावरच्या घड्याळाचा काटा एकीकडे गव्हर्नर दोन हातानी ओढीत आहे, तर तोच काटा फिरोजशा मेथा अगदी विरुद्ध मुद्रेने आणि दातओठ चावीत मागे खेचीत आहेत. असे ते विनोदी चित्र होते. ते इकडल्या अनेक पत्रानी छापलेच होते. पण लंडनच्या रिव्यू ऑफ रिव्हूज मासिकाने सुद्धा ते उद्धत केले होते. ठाण्याच्या तात्या फडक्यांनी आपल्या हिंदू पंच पत्रांत "मेथानी सरकारची जिरवली" असे एक मर्मभेदक विनोदी व सचित्र लेखही छापला होता.
[ही आठवण लोकमान्याचे संपादक श्रीयुत गाडगीळ यांनी इतर मजकूर बाजूला सारून, तातडीने ता. १ सपटंबरच्याच अंकात छापली. याच दिवशी नवे स्टॅण्डर्ड उर्फ बर्मा टाइम सगळीकडे चालू झाले. कॉर्पोरेशन बऱ्याच मेम्बरानी आठवणीची कथा माहीत नव्हती. नव्या पालवीची मंडळी ती! पण ही आठवण वाचतांच, ता. ५ सपटंबर १९४२ शनिवारच्या सभेत बर्मा टाइमाचा ठराव आल्यावर त्यांनी तो एक मताने फेटाळून स्वर्गस्थ सर फिरोजशा मेथांच्या मुंबई टाइमाच्या स्वाभिमानाचा जोराने पुरस्कार केला.]
घड्याळाचे राजकारण
(नवशक्ति दैनिक, बुधवार ता. २३ सप्टेंबर १९४२)
[प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखनात विचारांना धक्के देण्याचा उत्कट गुण असतो. ही गोष्ट मऱ्हाठी वाचकांच्या चिरपरिचयाची आहे. `घड्याळाचे राजकारण` हा त्यांचा लेख नव्या टाइमाचे चीत्कार व चमत्कार दररोज प्रत्यक्ष अनुभवणाऱ्या वाचकांना विनोदाच्या गुदगुल्या करून विचारही करावयास लावील अशी उमेद आहे.]
-संपादक नवशक्ति
सरकारी सत्ता कोणाचेहि सहज बारा वाजवू शकते.
नवीन लष्करी स्टॅण्डर्ड टाइमाविषयी तक्रार करताना परवा असेंब्लीचे अंक नामदार सभासद खवळून म्हणाले की "आता मध्यरात्रीपूर्वीच बारा वाजतात, असले कसले हे स्टॅण्डर्ड टाइम?" त्यावर सभागृहात हास्याच्या फुसकुल्या उडाल्या यांत वास्तवीक हासण्यासारखे काय आहे? घड्याळाचे काय किंवा कोणाचे काय, बारा वाजायला अथवा वाजवायला मध्यान्ह किंवा मध्यरात्रच कशाला? सरकारी सत्ता कोणाचेहि, फार काय काळाचेहि बारा वाजवायला समर्थ असतां, मध्यरात्रीच्या ऐवजीं सकाळी उजाडताच घड्याळाचे बारा वाजले किंवा सरकारी नव्या कायद्याने वाजवले, तर तेसुद्धा नवलाचे अंक राजकारणच ठरेल. बरे, मध्यरात्री किंवा मध्यान्हीच बारा वाजले पाहिजेत, असा काही वेदाचा अथवा बायबलाचा पुरातन नियम अथवा सिद्धांत नाही. पेशवाईच्या वेळी सूर्योदयाला नि सूर्यास्ताला घटकापात्राचे आणि चिनी काचेच्या वाळूच्या घड्याळाचे बारा वाजत असत आणि मध्यान्हीला नि मध्यरात्रीला सहा वाजत असत. याचे अवशेष दाखले अलिबागच्या आंगऱ्याकडे आणि पनवेल नजिकच्या आपटे येथील इनामदाराकडे अजूनहि चालू असल्याचे समजते.
आंग्रेजानी उज्जनीला कशी धाब्यावर बसविली?
बिनचूक विजयशाली आंग्रेज सरकार देवदूतासमान हिंदुस्थानाचा उद्धार करायला येथे येण्यापूर्वी, उज्जनीवरून जाणाऱ्या मेरिडियन रेषेला (व्यामोत्तर वृत) शून्यरेषा कल्पून, पृथ्वीच्या अक्षांश रेखांशांची गणना करण्याचा सर्वत्र प्रघात होता. जयपूरच्या वेधशाळेने या प्रघाताला मान्यता दिलेली होती. पण आंग्रेजी सत्ता झाल्यावर उज्जनीच्या संस्कृताला नि संस्कृतीला कोण धूप घालणार? आंग्रेजानी ते व्यामोत्तर वृत्त ग्रिनिचला नेले आणि उज्जनीला बसविली धाब्यावर! जेवढा पराक्रम ज्या आंग्रेजांनी एकदा केला, त्यानी वर्तमानकाळातल्या यांत्रिक घड्याळांचे काटे आगेमागे खेचण्याचा दिग्विजय केला, तर त्यात नवल कशाचे आणि हास्याच्या फुसकुल्या तरी कशाला?
लोबो यांचे इंग्रेजी पुराण
या नव्या एकतास बढतीच्या टाइमाचे समर्थन करताना कलकत्त्याच्या रेडिओवरून श्री. जे. एम. लोबोप्रभू नावाच्या अंका पंडिताने अंक ग्रिजी पुराण झोडले होते. ते २२ ऑगस्ट १९४२ च्या `लिसनर`च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. त्यातला मुख्य मुद्दा एवढाच होता का, या योजनेने लोकांना अंधारापेक्षा भरपूर उजेड उपभोगाला मिळावा, तसेच उजाडताच ६-७ च्या जेवजी ७-८ वाजू लागले म्हणजे "लवकर निजे लवकर उठे, त्याला आरोग्य संपत्ति संतति, काय वाटेल ते भेटे." या सनातन जीवन-नियमाचे आपोआप बंधन पडून, आंग्रेजी अमदानीत हिंदी लोकांची आजवर झाली त्यापेक्षा दिढीदुपटीने भरभराट व्हावी. ही मनीषा काय वाईट आहे?
सरकार बोले नि काळ डळमळे
अहो, एका पंधरवडयातच नुसत्या मुंबईच्या लोकांच्या जीवनात केवढी उलाढाल नि उलटापालट झाली तीच पहा ना! भराभर सगळेजण उजाडण्यापूर्वीच उठून चहाच्या वेळेला पोटभर जेऊ लागले आणि आंघोळीच्या वेळेला स्टेशनांवर दिसू लागले. सकाळी १० च्या कचेऱ्या ९ वाजता गजबजू लागल्या. ही सारी धडपड अधिकात अधिक उजेडासाठी आणि बिजलीच्या खर्चाच्या बचतीसाठी! रात्री १० ला झोपी जाणारे आता ९ ला निजतात आणि पावणे आकराचा रेडिओचा कार्यक्रम पुरा ऐकून ११ ला पथारी गाठणारे आता १० लाच डाराडून घोरू लागतात. केवढा हा चमत्कार नुसत्या मायबाप सरकारच्या इच्छेचा! त्यानी घड्याळाचा काटा पुढे सरकावताच लोकांचे जीवनचक्र खाडाखोड एक तास अगोदर घडू लागले. `राजा बोले नि दळ हाले` ही पूर्वी नुसती एक म्हण होती. पण ती आता आपण प्रत्यक्ष अनुभवीत आहोत. `सरकार बोले नि काळ डळमळे` हा प्रकार मात्र मोठा मनोरंजक खरा.
सूर्यचंद्राची चैन पण कारकुनांची?
या नव्या सरकारी टाइमाने सूर्य चंद्रावर एक प्रकारे मोठा उपकार केला असे म्हणावे लागते साडेसहाला उगवणारा सूर्य आता साडेसाताला उगवतो आणि एक तास उशीरा मावळतो. काय बहादुर आमच्या सरकारची ही सत्ता! लेखणीच्या फटकाऱ्याने त्यांनी सूर्य चंद्रादि ग्रहांना कामावर एक तास उशीरा येण्याची सवलत दिली. पण बेट्या कष्टाळू नोकरीवाल्या कारकुनाना मात्र एकतास लवकर धावपळ करायला लावले!
लवकर यावे-उशीरा जावे
अधिक उजेड देणाऱ्या नव्या टाइमाच्या उजेडाचा फायदा नोकर वर्गापेक्षा सरकारला आणि भाण्डवलबाज देशी व्यापारी कंपन्याना मात्र चांगला फळफळला. गुमास्ता कायदा झाल्यामुळे नोकराना ८ ते १० तास राबवण्याच्या त्यांच्या धनिपणाच्या हक्कांवर बिब्बा फासला गेला होता. तरीसुद्धा त्या कायद्याने अधिकात अधिक नेमलेले कामाचे तास नोकरांकडून पिळून मळून घ्यायला ते कमी करीत नव्हतेच. एका अपटूडेट फॅशनवर चालविलेल्या गुजराथी मालकाच्या विमा कंपनीच्या हापीसांत बोर्डावर अशी नोटीस लावलेली आहे-
"पुढे सूचना होईपर्यन्त नोकर लोकाना रविवारची सुट्टी देण्यात येत आहे."
याचा स्पष्ट अर्थ, गुमास्ता कायद्याखाली या कंपनीला दण्ड होईपर्यन्त तेथच्या कारकुनादि पांढरपेशा हमालाना रविवारचीसुद्धा सुट्टी मिळत नसे. आता तर मायबाप सरकारच्या महाकृपेने घड्याळेच एकतास पुढे सरकली. तेव्हा लवकर याये न उशीराने जावे हा संभावीत खाक्या अनेक देशी व्यापाऱ्यांच्या कंपन्यात चालू झाला आहे. उजेडाच्या सबबीवर नोकराना जास्त तास राबवले तरी ते बिचारे पोटभरू कशाला कोणाकडे भरायला तक्रार करणार? साडेसात तासांवर केलेल्या जादा कामाच्या वेतनाच्या बळजबरीच्या पावत्या लिहून घेतल्या का बसला तो गुमास्ता कायदा कंपनीच्या इमारतीच्या धाब्यावर! सारांश मुंबईच्या कोर्टात अिंग्रेजी दिमाखावर थाटलेल्या बहुतेक देशी व्यापाऱ्यांच्या कंपन्याना या अधिक उजेड देणाच्या टाइमाचा उत्तम फायदा घेता येत आहे. बिचारे नोकर हापिसात जरी एकतास आधी गेले, तरी घरी परतण्याला त्याना अंधारातच वीजगाड्या शोधाव्या लागतात. तेव्हा नव्या सरकारी स्टॅण्डर्ड टाइमाची, जादा उजेडाची जाहीर झालेली सबब अथवा सवलत कोण भाग्यवान उपभोगतो. हा सुद्धा इतिहास-संशोधना इतकाच किचकट प्रश्न होऊन बसला आहे. नव्हे का?
पंचांगें नि ज्योतिषी यांची तिरपीट
नव्या टाइमाने सूर्य चंद्राला नोटिसाचे पोटीस लावलेच आहे. पण ग्रहणे वर्तविणाऱ्या पंचागाची पाचहि अंगे आरपार ठेचाळून त्यांच्या ग्रहगतीना आणि समुद्राच्या भरत्या ओहोट्यांना ग्रहणे लावली आहेत. वजाबाकी बेरजेच्या अंकगणिताशिवाय आता कोणत्याहि ज्योतिष्याची धडगत नाही. ता. १ सप्टेंबर १९४२ नंतर जन्माला आलेल्या मुलांच्या जन्मवेळा मुंबई स्टॅण्डर्ड का नवे सरकारी लष्करी टाइम. याचा खुलासा झाल्याशिवाय, ज्योतिष्यांना आता कुंडल्या मांडायची पंचात पडू लागली आहे.
याशिवाय पंचांगे लिहून तयार करणाऱ्या पुरंदऱ्यादि गणकावर तर मोठीच आपत्ति आली. ज्यांनी पुढील सालच्या पंचांगांतले सगळे रकाने मुंबई अथवा जुन्या स्टॅण्डर्ड टाइमाप्रमाणे लिहिले अथवा छापले असतील, त्याना ते सारे आंकडे मुंबई टाइमात १ तास ३९ मिनिटे आणि स्टॅण्डर्ड टाइमांत एक तास अधिक मिळवून बदलण्याची रिकामटेकडी कारकुनी करावी लागणार.
लंडनबरोबरच हिंदुस्थानचे १२ वाजविण्याचे महत्वाचे राजकारण
निरनिराळ्या देशांतली घड्याळे तेथल्या सूर्योदयावर बसविलेली असतात आणि आहेत. पण ब्रिटीश लोकांच्या साम्राज्यावर सूर्य कधीच मावळत नसल्यामुळे, त्यानी आपल्या देशांतल्या ग्रिनिचच्या मध्यरात्रीवर अंकित भारताचे घड्याळांचे काटे बदलून टाकले आणि पुढेहि ते टाकतील. सत्ताधीशांना अशक्य असे काय असते? ग्रिनिचला मध्यरात्री १२ वाजले, म्हणजे-
न्यूयॉर्कला - रात्रीचे ८ वाजतात.
मॉस्कोला - पहाटेचे ४ वाजतात.
कायरोला - पहाटेचे ३ वाजतात.
केपटाउनला - रात्रीचे २ वाजतात.
चुंकिंगला - सकाळचे ७ वाजतात.
सिडने (ऑस्ट्रेलिया) - सकाळचे १० वाजतात.
हिंदुस्थान, दिल्ली - सकाळचे ६-३० वाजतात.
म्हणजे ग्रिनीचच्या मध्यरात्रीच्या १२ ला उजाडताच आमचे साडेसहा वाजतात. आता लंडनच्या बारांत आणि आमच्या घड्याळात फक्त साडेपाच तासाचे अंतर शिल्लक राहिले आहे. मध्यरात्र काय नि पहाट काय, या सगळ्या मानायच्या गोष्टी आहेत. लंडनबरोबरच हिंदुस्थानचे बारा वाजले अथवा वाजवले, तर इंग्लंड आणि हिंदुस्थान यांच्या जिवस्य कंठस्य दोस्तीचे ते एक ठळक उदाहरण होईल आणि आज येथे स्वराज्याच्या प्रश्नावर जो राजकारणी बाधा पडला आहे तोसुद्धा, मला वाटते. या घड्याळाच्या राजकारणाने अथवा राजीकरणाने सुटण्याचा संभव आहे. शिवाय उजाडताच आमचे बारा वाजू लागले, तर जुन्या मऱ्हाठशाही आणि पेशवाई टाइमाचा जीर्णोद्धार केल्याचेहि पुण्य सरकार आणि जनता यांच्या पदरी पडेल. इंद्रप्रस्थाच्या उत्तुंग विधिमण्डळात घुसलेल्या आमच्या देशी चाणक्यांनी हा घड्याळाच्या राजकारणाचा नाजूक प्रश्न तेथल्या खलबतखान्याच्या खलबत्त्यांत खलून पहाण्यासारखा आहे.
****
आठवण २ री
ता. २३ सप्टेंबर १९४२, बुधवार
"का नाही? ईश्वर करील तर तसेहि होईल!"
- सर फिरोजशहा मेथा
मुंबई म्युनिसिपालीटीच्या समोर सर फिरोजशा मेथा यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्या भोवती कठड्याचा कंपाउण्ड आहे, ती जागा म्युनिसिपालटीची इमारत बांधली तेव्हापासून किती तरी वर्षे रिकामीच होती. सभोवार लोखंडी कठडा आणि आतल्या जागेवर गवत वाढलेले, तर कधि ते कापलेले. आजूबाजूला मोठमोठ्या प्रेक्षणीय इमारती झाल्या तरी तो रिकामा कंपाउण्ड तसाच पडून होता. ही रिकामी कठडा घातलेली जागा ठेवली आहे तरी कशाला? असा ज्याला त्याला मोठा आचंबा वाटायचा, लहानपणी पनवेलीहून मी मुंबईला यायचो तेव्हा कोटातल्या बाल-भटकन्तीत ही जागा पाहून मलाहि तसेच वाटायचे. एकदा-असेन त्या वेळी मी १३-१४ वर्षांचा. मी तेथल्या शिपायाला विचारले, "काहो, ही रिकामी कठड्याची जागा कशाला ठेवली आहे?" शाळेत जाणारा एक पोरगा दुपारच्या वेळेला एकटा भटकतांना पाहून त्या शिपायाने मला सांगितले "शाळा सोडून जी पोरं कोटात उनाडक्या करायला येतात, त्यांना येथे कोंडून ठेवतात, हा उनाड पोरांचा कोंडवाडा आहे."
साल काही बरोबर आठवत नाही पण सन १९०० नंतर केव्हा तरी कोल्हापूरच्या छत्रपति शाहू महाराजांनी मुंबई म्युनिसिपालटीकडे छत्रपति शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी त्या जागेची मागणी केली होती. `एक लाख रुपये रोख म्युनिसिपालटीला देऊन, स्वत:च्या खर्चाने मी शिवाजी महाराजांचा पुतळा येथे उभा करतो. म्युनिसिपालटीने परवानगी द्यावी` अशी ती मागणी होती. फिरोजशा मेथांनी त्या मागणीला विरोध केला. त्यांचे म्हणणे असे होते, "छत्रपति शिवाजी महाराज मला वंद्य आहेत. ते त्रिभुवनवंद्य आहेत. पण त्यांचा मुंबईशी संबंध काय? मुंबईच्या नागरिकी जीवनाशी ज्यांचा निकटचा संबंध असेल, त्याच थोर लोकाग्रणींचे पुतळे मुंबई शहरांत मुंबई म्युनिसिपालटीने स्वत:च्या खर्चाने अथवा सार्वजनिक वर्गणीने उभारले पाहिजेत. इतरांचा या शहराशी संबंध काय मुळी?" फिरोजशाचे वक्तृत्व म्हणजे महांकाळी तोफच ती! एकदा धडधडाट सुरू झाला का सारे प्रतिस्पर्धी चकणाचूर जागच्याजागी थंडगार पडायचे! शिवाजीच्या पुतळ्याचा ठराव फेटाळला गेला.
पुढे पंचम जॉर्ज बादशहांच्या राज्याभिषेकाचा योग आला. त्यावेळी-सध्या म्यूझियमच्या आवारात जो `सेलर किंग` (खलाशी राजा) म्हणून बादशहाचा पुतळा उभा आहे-तो विलायतेहून इकडे आणविलेला होता. तो पुतळा म्युनिसिपालटी समोरच्या त्या रिकाम्या जागेवर उभा करावा, असा काही मेंबरांनी बेत केला आणि तसा कार्पोरेशनमध्ये ठरावहि आणला त्याला तर फिरोजशानी फारच कडाक्याचा वाद करून विरोध केला. "मुंबईच्या नागरी जीवनाशी बादशहांचा संबंध काय? पंचम जॉर्ज असतील भारतखंडाचे बादशहा पण त्यांनी मुंबईच्या नागरी जीवनासाठी काय केले आहे?" ठरावावर मते घेतां ती समसमान पडली. प्रेसिडेण्ट नात्याने सर फिरोजशानी नकाराच्या बाजूला आपले जादा मत (कास्टिंग व्होट) टाकून ठराव फेटाळला.
त्यावर सर दिनशा अॅडलजी वाच्छा संतापून उठले नि म्हणाले - "काही वर्षांपूर्वी छत्रपति शिवाजीच्या पुतळ्याचा ठराव आला होता, त्याला सर साहेबांनी विरोध करून तो फेटाळला. आज प्रत्यक्ष आपल्या सार्वभौम बादशहाच्या पुतळ्याचा ठराव आला, तोसुद्धा मेथांनी खाली पाडला. मग त्या कंपाउण्डात स्वत:चा पुतळा त्यांना उभा करायचा आहे की काय?
फिरोजशा ताडकन उठले आणि ठासून म्हणाले, "कां नाही? का नाही? ईश्वर करील तर तसेहि होईल." (Why not? Why not? If God so wills,) अखेर तसेच झाले.
****
आठवण ३ री
शनिवार ता. १० ऑक्टोबर १९४२
"शीलापुढे मला प्राणाची पर्वा नाही"
- सर भालचंद्र भाटवडेकर
प्लेग इन्फ्लुएन्झाच्या साथीप्रमाणेच छोट्या मोठ्या बँका बुडण्याच्या साथी मुंबईने पुष्कळ अनुभवल्या आहेत. द्वारकादास धरमसीच्या खुनाने अथवा आत्महत्येने (हे गूढ कधीच सुटलेले नाही!) त्यांच्या पेढीचे दिवाळे वाजले, तेव्हा तर सारी मुंबई इतकी हादरली की त्या हादऱ्यापुढे स्पीसी बँकेचे बळजबरीचे दिवाळे आणि पाठोपाठ १०-१५ दिवसांतच शेट चुनिलाल सरैयांच्या आकस्मिक मृत्यूच्या मुकाबल्याचा हादरा काहीच नव्हे.
साल अंदाज १९१२-१३ असावे. जाफर जूसब नावाच्या इसमाने चालविलेल्या क्रेडिट बँकेचे एकाकी दिवाळे वाजले. लोकांत त्याची चर्चा चिकित्सा होते न होते तोच गिरगांवात दक्षिणी मंडळीनी चालविलेल्या बाँबे बॅंकिंग कं. लि. ने अचानक एक दिवस आपले दरवाजे बंद केले. बँकांची दिवाळी स्पर्शजन्य रोगांसारखीच असतात आणि ही साथ केव्हा येईल त्याचा नेम सांगता येत नाही. एकदा ती आली का बँकांच्या क्षेत्रांत कोठकोठे कसे नि कसले सुरूंग धडाधड उडतील ते उमगणे कठीण जाते.
सर भालचंद्र कृष्ण भाटवडेकर हे मुंबईचे एक सुप्रसिद्ध नामांकित डॉक्टर आणि नागरीक पुढारी होते. त्यांच्यासारखा लोकहितवादी, गरिबाचा कनवाळू आणि मागसलेल्या नि पुढारलेल्या समाजांत सरमिसळ दिलदारीने मिसळणारा `जण्टलमन` माझ्या तरी पहाण्यात दुसरा नाही. सरसाहेबांचे चरित्र, चारित्र्य नि शील गंगाजळासारखे निर्मळ असे, त्यांची शुद्धता राखण्यासाठी पडेल तो स्वार्थत्याग करायला ते मागेपुढे पहात नसत. त्यांची डॉक्टरी प्रॅक्टिस हजारो रुपयांची होती, तरी गोरगरिबांना मोफत औषधे आणि मोफत व्हिजिट्स देण्यातहि सरसाहेबांनी फार मोठी जनसेवा बजावलेली आहे. सन १८९२ ते १९०९ पर्यन्त मुंबई शहरांत बोकाळलेल्या लुटारू सोनेरी टोळीकडून डॉक्टर भालचंद्रांना फसवून, कचाट्यांत पकडून लुबाडण्याचे अनेक धाडसी यत्न गोल्डन गॅंगवाल्यांनी केले. त्या रोमहर्षक कथा त्यांचे वडील बंधू कै. तात्यासाहेब यांनी `मनोरंजन` मासिकात छापलेल्या आहेत.
डॉ. भालचंद्रांचे नैतिक तेज त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच अलोट चमकत असे. अर्धचंद्राकृति गंध लावलेला त्यांचा तो शुचिर्भूत धीरगंभीर आणि आनंदी चेहरा पहाताच रोग्याचा अर्धारोग आपोआप बरा होऊन, त्याला आरोग्याचा आत्मविश्वास उत्पन्न व्हायचा. सरसाहेब मवाळांत मोडत असत. तथापि त्यांची जनसेवा आणि शील तत्कालीन अनेक मवाळाग्रणीपेक्षा किती तरी उच्च दर्जाचे असे, हे मी स्वानुभवाने म्हणू शकतो.
सर भालचंद्र बाँबे बॅंकिंग कंपनीचे एक डायरेक्टर. तशात बँकेचे एकाकी बारा वाजले. पुष्कळ वर्षे ही बॅंक पालव रोडवर सध्या कोल्हापुरी संगीत चिवडेवाल्याचे हॉटेल आहे, त्या नाईक बिल्डिंगच्या माडीवर होती. (ऑन. गोखले मुंबईला आले का याच जागेत त्यांचा मुक्काम असायचा.) दिवाळ्याच्या वेळाला, सध्या ऑनेस्टी कंपनी आहे, त्या इमारतीत ही बॅंक गेली होती. भागीदारांचा नि ठेवीवाल्यांचा या इमारतीला गराडा पडला. माझ्यासारख्या रिकामटवळ्या बघ्यानीहि त्या गर्दीत भर घातली, पोलिस कमिशनर मि. एस्. एम्. एडवर्डस यांनी स्वतः पोलिसपार्टीचा बंदोबस्त कडेकोट ठेवला होता. बॅंकेचे सरकारी `कर्मनिपट्ये` (लिक्विडेटर) मे. सेठना आणि त्यांची कारकून सेना कागदपत्रांच्या ढिगारांत उंदरासारखी धडपडत होती. बँकांच्या दिवाळ्याच्या वेळी डायरेक्टर लोक हाफिसाकडे फिरकण्याचा पराक्रम सहसा करीत नाहीत, कारण खवळलेला जनसमूह कोणत्या वेळी काय करील, याचा नेम नसतो.
बँकांचे काय किंवा विमा कंपन्यांचे काय, डायरेक्टर म्हणजे नुसते गुळाचे गणपति असतात. प्रत्यक्ष व्यवहाराशी त्यांचा कसलाच संबंध येत नाही, आणि वेळी दिवाळे वाजलेच, तर ते कशाने वाजले याचा त्यांना काही अंदाजहि नसतो. सारे नुसते अडणीवरचे असतात!
पण सर भालचंद्रांचे गाडेच न्यारे! "बँक बुडाली. दक्षिण्यानी चालविलेली बॅंक बुडाली लोकांचे नुकसान झाले. दाक्षिणात्यांची व्यापारी पत गेली. मी तिचा एक डायरेक्टर, ऑफिसाकडे जाऊन मला चौकशी केलीच पाहिजे." असे निश्चयाने ठरवून, सर भालचंद्र बँकेच्या कचेरीकडे निघाले. त्यांची गाडी पहातांच लोकांनी आरड्याओरड्याला सुरुवात केली. शिव्याश्रापांचा हलकल्होळ उडवला. "आले साले हे डायरेक्टर आपले काळे तोंड लोकांना दाखवायला. चोपा-ठोका-जमिनदोस्त करा." इत्यादि आणि वगैरे.
एडवर्डस कमिशनरने सरसाहेबांच्या गाडीला कौशल्याने पोलिसांचा गराडा घातला, सरसाहेब शांत मुद्रेने कचेरीत गेले. अवघ्या पांच मिनिटांत ते कचेरीच्या बाहेर पायऱ्यांवर येऊन उभे राहिले. बाजूला सेठना आणि एडवर्डस उभे होते. लोकांनी ओरडायला सुरुवात केली. सरसाहेबांनी हात जोडले. पोलिस कमिशनरने `ऐका ऐका` अशी धमकावणी देऊन शांतता केली. सरसाहेब बोलू लागले. -
"लोकहो, होऊ नये ते झाले. डायरेक्टर या नात्याने अपराधाचा माझा वाटा पत्करायला हा मी तुमच्यासमोर उभा आहे. शीलापुढे माझ्या दौलतीचीच काय, पण प्राणाचीहि मला पर्वा नाही. हे माझे बॅंकबुक आणि सही केलेले हे कोऱ्या चेकांचे पुस्तक मी लिक्विडेटर सेठनासाहेब यांच्या हवाली करीत आहे. हिस्सेरशीने जेवढी पैशांची जबाबदारी, डायरेक्टर नात्याने, माझ्यावर येत असेल, तेवढी रक्कम खुशाल त्यांनी वसूल करून घ्यावी. कमी पडल्यास माझ्या इतर इस्टेटीवर भागवून घ्यावी. आपण सगळ्यांनी मला क्षमा करावी."
एवढा प्रकार होताच खवळलेला सगळा लोकसमूह आश्चर्याने नि आदराने एकदम गहिवरून आला. टाळ्या कडाडल्या आणि सरसाहेबांच्या उदार चारित्र्याचे धन्यवाद सगळ्या गिरगांवात नि मुंबईभर जो तो अभिमानाने गाऊ लागला. सर्व लोकांचे आदराचे नमस्कार घेत घेत गाडीत बसून सरसाहेब घराकडे परत गेले.
****
आठवणी ४ थी
ता. १७ ऑक्टोबर १९४२ शनिवार
"ईश-प्रार्थनेला बंदी? कोण करतो ते मी पहातो."
- पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर
जलसा म्हणजे कोल्हाटणीचा तमाशा! कै. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर याच्या गांधर्व महाविद्यालयाचे निशाण मुंबई शहरांत फडकू लागेपर्यंत सगळ्या लोकांची हीच समजूत होती. कुलीन स्त्रियांनी गायन वादन कलांचा व्यासंग करणे, हेसुद्धा महापाप समजले जात होते. `क्वचित् गानी पतिव्रता` हा आमच्या शास्त्रपुराणांचा दण्डक!
पंडितजींनी या दोनहि समजुतीचा बाष्कळपणा आपल्या कडव्या नीतिमत्तेने आणि विद्यालयाच्या नैतिक शिस्तीने पार धुडकावून, जलसा शब्दाला अभिवादनीय लोकमान्यत्व दिले आणि गायन वादन नर्तन कलांतील कुलीन स्त्रियांचा नष्ट झालेला अभिजात अधिकार पुन्हा प्रस्थापित केला. या बाबतीत लोकमताला अनुकूल कलाटणी देण्याचे महान् कार्य महाराष्ट्रांत पंडितजीनीच प्रथम केलेले आहे.
मुंबईतील मोठमोठ्या नामांकित सरकारी अधिकाऱ्यांच्या, बॅरिस्टर जज्जादि नागरिकांच्या सुना मुलींच्या गायन वादनाचा जाहीर जलसा तिकिटे लावून, गांधर्व महाविद्यालयाच्या इमारतींत करण्याच्या जाहिराती प्रथम जेव्हा फडकल्या, तेव्हा प्रत्येकाला आश्चर्याचा केवढा तरी धक्का बसला. धोबी तलावावरील (जुन्या) फ्रामजी कावसजी हॉलमध्ये शेकडो जाहीर जलसे करून गायन विद्येची महति पंडितजीनी आधीच विलक्षण लोकप्रिय केलेली होती. तशात त्यांचे ऋषितुल्य शील नीतिमत्ता शिस्त आणि कडवा करारी बाणा, यांच्यापुढे ते आश्चर्याचे नि आचंब्याचे ढगार आरपार वितळून गेले.
तिकिटे भराभर खपली. त्यांचे भाव वाढले. अखेर `जागा नाही` म्हणून पुष्कळ लोकांना परत जावे लागले. हो, थोरामोठ्यांच्या सुना मुली जाहीर जलशांत गाणार! हे त्यावेळी केवढे तरी मोठे आश्चर्य नि आकर्षण! या जलशांत पंडितजींचे गुरुवर्य कै. इचलकरंजीकर बाळकृष्णबोवा यांच्या गायनाचा कार्यक्रम सुरुवातीला ठेवला होता.
कुलीन स्त्रियांचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पंडितजींनी फार सुंदर भाषण केले. त्याचा मतितार्थ असा -"गायन, वादन, नर्तन कला प्राचीन काळी आमच्या देवघरांत नि माजघरांत वावरत असत, पूजल्या जात असत, त्या आमच्या संसाराचा अलंकार असत. पुढे त्यांना आम्ही घराबाहेर हुसकून लावल्या. हिंदूच्या स्त्रिया घराबाहेर पडल्या अगर पाडल्या, म्हणजे त्यांना मुसलमानच पळवितात. गायन वादन विद्येचे असेच झाले. त्या परमपवित्र विद्येला गांधर्व महाविद्यालय आज सन्मानाने परत आणून त्यांची या देवघरांत पुन्हा स्थापना करीत आहे. सर्व सज्जनांचे आशिर्वाद असावे."
बाळकृष्णबोवांचे डोळे पाण्याने भरून आले. पंडितजींनी त्यांच्या पायावर मस्तक ठेवले. बोवांनी आशिर्वाद दिला. त्यांचा कण्ठ भरून आला नि उपरण्याने त्यांनी आपले डोळे पुसले. श्रोत्यांत टाळ्यांचा कडकडाट उडाला. त्या रात्रीचा जलसा तर रंगदार झालाच, पण पुढे `लोकाग्रहास्तव` त्याच्या अनेक आवृत्त्या विद्यालयांत झडल्या.
पंडितजींचे खरे सात्विक तपश्चर्येचे आत्मतेज चमकले कोकोनाडाच्या काँग्रेसच्या प्रचंड मंडपात. सर्व बालगोपाल शिष्यगणांची सेना घेऊन पंडितजी मुद्दाम तेथे गेले होते. व्यासपीठावर वाद्यवृंद सूरबद लावून ठेवला होता. अध्यक्ष मौलाना महंमदअल्ली यांची स्वारी बॅण्ड वाजंत्र्याच्या दणदणाटात सभास्थानी येऊन स्थानापन्न झाली. पंडितजी आणि त्यांचे छात्रगण ईश-प्रार्थनेसाठी पुढे सरसावले. वाद्यवृंदाचा झंकार चालू झाला.
काय झाले असेल ते असो! अध्यक्ष महाराजांचे पित्त एकदम खवळले ते म्हणाले, "बंद करा ही वाद्ये. हे काय हिंदूंचे मंदिर आहे तर हा जलशाचा थाट? बंद करा." अध्यक्षांची ही डुरकणी ऐकताच सारे सभाजन विस्मित झाले. महात्मा गांधी, देशबंधू दास प्रभृति मंडळी तेथे होती. पण एकाचीहि छाती झाली नाही अध्यक्षांच्या प्रतिबंधाला विरोध करण्याची अथवा त्यांची समजूत घालण्याची. वाद्यांचे झंकार चालूच होते, ईशप्रार्थनेच्या संगीताच्या पाठपुराव्याला कोणीतरी धावून येतो कीं काय, याची आतुर डोळ्यांनी पंडितजी सभाजनांकडून अपेक्षा करीत टकमक पहात होते. वाद्यांचे झंकार थांबत नाहीसे पाहून महंमदअल्ली पुन्हा दटावणीत म्हणाले :- "काय हो, बंद करा म्हणून सांगतो ना? बंद करा."
थेट मऱ्हाठा वीराच्या अवसानात पंडितजी खाडकन उठून उभे राहिले आणि (हिंदी) भाषेत आपल्या दणदणाट्या आवाजात सभागृहाला उद्देशून म्हणाले – "हिंदवी राष्ट्रसभेच्या मंडपात ईश-प्रार्थनेच्या संगीताला मज्जाव? कोण राष्ट्राभिमानी हे सहन करील? अध्यक्ष म्हणतात, हे काय हिंदूंचे मंदिर आहे? मी त्यांना विचारतो, ही काय तुमची मशिद आहे? अध्यक्ष महाराजांना वाद्यांचा एवढा तिटकारा, तर बॅण्ड, चौघडे, वाजंत्री वाजवीत एवढी मोठी स्वत:ची मिरवणूक सभेच्या दारापर्यन्त वाजत आली, तेव्हा कां नाही त्यांनी प्रतिबंध केला? आता ईश-प्रार्थनेच्या संगीताला प्रतिबंध? कोण मला प्रतिबंध करतो तेच आता पहातो." असे म्हणून त्याच आवाजाच्या चढत्या टिपेत "जय जगदीश हरे" या त्यांच्या पेटंट ईशस्तवनाला सुरुवात केली. पांच मिनिटेपर्यन्त हजारो सभाजनांचा तो प्रचंड जनसमूह पंडितजींनी नादमग्न डोलविला. वन्दे मातरम् गीताचे सूर काढताच सारी सभा तडाड उभी राहिली.
राष्ट्रसभेच्या तीन दिवसात प्रारंभाला ईशस्तवन आणि अखेर वन्दे मातरम् गीत पंडितजींनी नियमित गाऊन दाखवून, ते एकाद्या विजयशाली मऱ्हाठा वीराप्रमाणे हजारो लोकांचे धन्यवाद घेत घेत मुंबईला परत आले.
****
आठवण ५ वी
ता. ७ नवेंबर १९४२, शनिवार
हिंदी माणसाची किंमत काय फक्त शंभर रुपये?
- मिस आवडाबाई
वंगभंग नि स्वदेशी चळवळीने हिंदुस्थानात राष्ट्रीय भावनेचा प्रसार केला. त्या पूर्वी विलायतेहूनं येणारा प्रत्येक गोरा अधिकारी नि व्यापारी हिंदी लोकांना जंगली समजत असे. कर्नल विल्सनची घोड्यांची सर्कस प्रथम मुंबईला आली, तेव्हा तोहि लेकाचा प्रत्येक खेळाला जाहीर बोंबलून सांगायचा की `घोड्यांकडून असली बुद्धीची कामे आम्ही गोऱ्या बृहस्पतीनीच करून घ्यावी. ते हिंदी आदमीचे काम नव्हे.` त्याची ही घमेण्ड कै. प्रो. विष्णुपंत छत्रे यांनी जिरवली.
मागची स्वाभिमानी पिढी
आजकाल पुरोगामीपणाच्या वल्गनांना केवढाहि ताशेढोलवजा जोर चढलेला असला, तरी कोणत्याहि क्षेत्रात नि कोणत्याहि बाबतीत परक्यांची मुजोरी अथवा माजोरी लवमात्र न जुमानता त्यांचा जागच्या जागी हात धरून, `तूं करशील त्यापेक्षा आम्ही कांकणभर अधिक काही तरी करून दाखवायला समर्थ आहोत` ही आमच्या गेल्या पिढीची स्वाभिमानी हिरीरी आजच्या मंडळीत फारशी दिसत नाही.
सर्कस म्हटली की छत्रे यांचे नांव प्रामुख्याने पुढे येते. त्यांच्या मागून जगन्नाथ गाडगीळ, डुबेरकर, पटवर्धन, शेलार, कार्लेकर, देवल प्रभृति अनेक नावे नामांकित आहेतच. पण हिंदी सर्कशीचा आद्यमान विष्णूपंत छत्र्यांचा. छत्रे नांव आठवले का मिस आवडा या धाडशी बाईचे नांव कोणालाहि विसरता येणार नाही. अगदी लहानपणापासून या बाईने तारेवरील, घोड्यावरील, सायकलवरील, झुलत्या बारवरील, त्याचप्रमाणें वाघ सिंहादि हिंस्त्र पशूंना खेळवण्याची अचाट धाडसाची प्रेक्षणीय कामे करण्यात फार मोठा लौकीक मिळवला होता. तिच्या अंमदानीत या कामांत तिची बरोबरी करणारा अगर करणारी एकहि बुवा अथवा बाई पुढे आली नाही. तरुणपणी ती सडपातळ बांध्याची होती. मागाहून ती फार सुटली. तरी तिच्या कामांत तिचे शारीरिक चापल्य बिनजोडच राहिले.
मिस आवडा आज काम करणार
अशा जाहिराती फडकल्या, का सर्कशीच्या तंबूवर हजारो प्रेक्षकांची अगदी झुंबड उडायची, एवढी तिची लोकमान्यता कमाल शिगेला पोचलेली होती.चिनी, जपानी, मलबारी किंवा युरपियन, कोणत्याहि ईसमाने कसलीहि `अॅक्रोबेटिक फीट` केलेली तिने पाहिली का तडाड ती रिंगणांत शिरून जशीच्या तशी अगदी सहज लीलेने करून दाखवीत असे, या बाबतीत तिचा स्वाभिमान, आत्मविश्वास आणि विशेषतः देशाभिमान अत्यंत जाज्वल्य होता. "परक्यांनी अमूक एक करावे नि ते आपल्याला साधू नये, किती नामुष्कीची गोष्ट! काय आम्ही माणसे नव्हेत? काय आम्हाला कला नाही? संस्कृति नाही? अक्कल नाही? स्वाभिमान नाही? हव्या त्या क्षेत्रात आमचा भारत परक्यांना पुरून उरेल." अशा तडफेची मिस आवडा होती.
वॉर्डनची सर्कस
बऱ्याच वर्षांपूर्वी मुंबईला वॉर्डनची कर्सस आली होती. सगळे खेळाडू लालबुंद गोरे होते. घोड्यांचा खरारा करायला, वाघ, सिंह, हत्तींची लीद काढायला आणि झाडझाडोरा करायला मात्र त्याने हिंदी नि आफ्रिकन लोक ठेवले होते. कापाच्या मैदानावर (म्हणजे आजच्या आझाद मैदानावर) सर्कशीचा भव्य तंबू ठोकला होता.
वॉर्डनने `लूपींग ध लूप` म्हणजे श्रीकारीच्या आकाराच्या प्रचंड वेटाळ्यातून सायकल चालविण्याचे एक आश्चर्यकारक नवीन आकर्षण आणले होते. त्या वेटाळ्याच्या मधल्या गाठीतून सायकलस्वार जाताना त्याचे
जमिनीकडे डोके नि आकाशाकडे सायकलसह पाय
असा प्रकार क्षणभर होत असे. पहाताना प्रेक्षक अगदी थरारून जात, सगळी मुंबई हा चमत्कार पहावयाला धावत असे. `कमाल झाली बुवा या गोऱ्या लोकांची! काय विलक्षण करामत करतात एकेक!` जो तो बोलू लागला.
वॉर्डन साहेब तर काय अगदी घमेण्डीने फुरफुरलेला असे. दर रात्रीच्या खेळाला तो जाहीर सांगत असे की, "हा `लूपिंग ध लूप`चा प्रयोग जगात फक्त माझ्या सर्कशीत होतो, इतरांची ताकद नाही. हिंदुस्थानात तर तो कोणालाहि साधायचा नाही. जो कोणी हिंदी आदमी तो करून दाखवील, त्याला शंभर रुपये इनाम."
मिस आवडाने वॉर्डनच्या जाहिरातीत ही घमेण्ड वाचली आणि प्रो. काशीनाथपत छत्र्यांना बरोबर घेऊन ती एका रात्री वॉर्डनच्या खेळाला गुपचीप जाऊन बसली. (या वेळी विष्णुपंतांची सर्कस काशीनाथपंत चालवीत होते.) दोघांनी तो खेळ पाहिला आणि मिस आवडाने वॉर्डन साहेबाला रिंगमध्ये जाहीर हटकले.
मिस आवडा - साहेब, आहे काय या खेळात एवढे? कोणीहि तो करून दाखवील.
वॉर्डन - करून दाखवील त्याला शंभर रूपयांचे बक्षिस मी जाहीर केलेच आहे.
मिस आवडा - हिंदी लोकांच्या प्राणांची किंमत काय तुम्ही शंभर रुपयेच करता? आमच्या लोकांकडून हजारो रुपयांचा गल्ला गोळा करून या देशात जगायला आलात आणि आमची किंमत काय फक्त शंभर रुपये? पांच हजार रुपयाची पैज लावीत असाल, तर चला, मी स्वत: हे काम करून दाखवते तुम्हाला.
पैजेचे आव्हान
साध्यासुध्या पोषाखात आलेली ही दखनी बाई मला असली धमकी देते, हे पाहून वॉर्डनसाहेब खदखदा हासू लागले. ही बाई सुप्रसिद्ध सर्कससम्राज्ञी मिस आवडा आणि शेजारी जवळच बसलेले प्रो. काशिनाथपंत छत्रे, हे वॉर्डनला उमगले नाही, तरी लोक त्यांना पुरेपूर ओळखीतच होते. त्यांनी टाळ्यांचा मोठा कडकडात केला.
`अहो साहेब, छाती असेल तर पैज पत्करा`
असा साऱ्या तंबूत एकच ओरडा झाला. साहेब म्हणजे जातीचा इरसाल घमण्डखोर! त्याने पैजेचे आव्हान घेतले. चार दिवसांची मुदत, सगळीकडे तशा जाहिराती फडकल्या, सारी मुंबई कुतुहलाने कुजबुजू लागली. प्रो. काशिनाथपंताना मिस आवडाचा धाडसी स्वभाव माहीत होता. तरीसुद्धा मनात ते कचरत होते, `आवडाने उगाच ही होड घेतली. आधी प्रयोग करून पहायचा नि मग तरी चॅलेन्ज द्यायचे` असे त्यांचे म्हणणे पडले. ती म्हणाली - "आहे काय त्यात प्रयोग करण्यासारखे? साधा गतीचा नि ग्रॅविटीचा प्रयोग आहे हा. हा टोपडा कशाला एवढा दिमाख सांगतो?"
पैजेची ती रात्र आली. तंबूवर हजारो प्रेक्षकांचा तोबा उडाला. तिकिटांचे दर डबलले. प्रो. काशिनाथपंत नि मिस आवडा आपल्या सर्कशीच्या प्रयोगी (प्रोफेशनल) पोषाखांत तंबूमध्ये येताच टाळ्यांच्या गगनभेदी कडकडाटात लोकांनी त्यांचे स्वागत केले. `लूपिंग ध लूप`ची रिंगणात मांडणी झाली. छातीवर झगझगीत पदकांच्या माळा लटकावलेले वॉर्डनसाहेब मिस्किलपणे हासत हासत रिंगमध्ये आले आणि त्यांनी मिस आवडाला
"कमॉन प्लीज"
अशी आव्हानाची हाक मारली, लखलखत्या बिजलीच्या अवसानात मिस आवडाने रिंगमध्ये आकर्षक उडी घेतली. लोकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात ती ठासून म्हणाली – "प्रथम तुमच्या माणसाला प्रयोग करायला बोलवा. त्याचा झाला की मग मी करून दाखवते." साहेब काकू करू लागला. आवडा पुन्हा ठासून म्हणाली – "लूपची मांडणी बरोबर आहे का नाही, हे मला आधी पाहिलं पाहिजे नि लोकांना तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं पाहिजे." साहेबाने `ठीक` म्हटले नि मांडणीची स्वत: पुन्हा नीट तपासणी केली. वॉर्डनचा माणूस आला. त्याने रोजच्यासारखा प्रयोग करून दाखवला. मिस आवडाने त्याची सायकल मागितली. साहेब ती देई ना. तो म्हणाला `सायकल तुमची तुम्ही घ्या.` आवडाने झटकन हिसडा मारून ती घेतली आणि तिचे फ्रण्टव्हील (पुढचे चाक) तपासले.
आवडा - खामोष, खामोष. भाई बेहनो देखो. ख्याल रखना चाहिये इस सायकलका अगला चाक बिलकूल फिक्स्ड है. लेकिन मै नहि चाहती इस सायकलको. कोई भाई मेरेको अपनी सायकल दो मिनटके लिये देनेकी मेहरबानी करना चाहता है?
भराभर पाचसहा जणांनी बाहेर ठेवलेल्या आपल्या सायकली रिंगमध्ये आणल्या. त्यातली एक पसंत करून मिस आवडा म्हणाली - "देखो सब लोग. वॉर्डनका सायकलका फ्रण्टव्हील बिलकूल फिक्स्ड है. यह मेरा सायकलका चाक देखो. फ्री है. देखिये", असे म्हणत तिने ते गरगर फिरवून रिंगणांत सगळ्यांना दाखवले, फ्रीव्हीलची ती सायकल घेऊन, तंबूच्या माथ्याला उंचवर भिडलेल्या लूपच्या माचीवर आवडा जाऊन उभी राहिली. बॅण्डचे वादन चालू झाले. लोकांचा उत्साह काय सांगावा! ते सारे "चलाव चलाव, आवडाबाई, हिंमतसे चलाव, जीते रहो." असा जयघोष करू लागले. काशीनाथपंतहि रिंगमध्ये उभे राहून तिला उत्तेजन देत होते.
काशीनाथपंत - रेडी? - रेडी? वन-टू-थ्री-
`थ्री` म्हणताच सायकलस्वार झालेली मिस आवडा एका क्षणात त्या लूपच्या प्रचंड श्रीकारी वेटाळ्यांतून सण्णदिशी गोलांटी मारून रिंगमध्ये सरळ सुखरूप येऊन दाखल झाली, प्रेक्षकांना तिने ती ठरावीक सर्कसी दिमाखाचा प्रणाम केला. सगळा तंबू जयजयकाराच्या आरोळ्यांनी नि टाळ्यांच्या दणदणाटाने दणाणला.
आवडाने पैज जिंकली
एवढ्या नुसत्या बातमीनेच तंबूबाहेरच्या प्रचंड जमावाने जयघोषाच्या आरोळ्या ठोकल्या. वॉर्डनसाहेबाचे तोंड पहाण्यासारखेच होते. जातीचा पडला बेटा इंग्रेज. पडलो तरी माझे नाक वर म्हणणारा. त्याने मिस आवडाचा मोठा गौरव केला आणि पैजेचे रुपये चांदीच्या तबकात भरून तिच्या हाती दिले. काशीनाथपंतानी आवडाची पाठ थोपटली. झाली आमची आठवण.
आठवण ६ वी
रविवार, ता. २९ नवंबर १९४२
नाव शिवाजीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे.
- माधवराव पाटणकर
सन १९०६ चा एप्रिलचा शेवटचा आठवडा असावा तो. ठाकुरद्वारच्या काळ्या रामाच्या मंदिराला लोकांचा प्रचंड गराडा पडला होता. जो तो आंत घुसण्याची धडपड करीत होता. सभामंडपांत एक राजबिंडा पुरुष श्रीरामाच्या मूर्तीकडे तोंड करून उभा होता. मस्तकाला भरजरी हिरव्या रंगाचा फल्लेदार फेटा, अंगांत पेशवाई थाटाचा पांढरा आंगरखा. त्यावर रुंद रेशमी लालकाठी उपरणे. पेटी तबल्याच्या साथीवर तो भव्य पुरुष आपल्या मर्दानी गोड आवाजांत आणि वीरश्रीच्या हावभावांत शिवाजी महाराजांचा स्वरचित पोवाडा गात होता. आबालवृद्ध स्त्रीपुरुष श्रोते स्वदेशाभिमानाच्या नि वीरश्रीच्या रंगांत अगदी दंग होते. मधून मधून जयघोष होत होते आणि टाळ्या कडाडत होत्या. गाणाराचा आवाज एवढा जबरदस्त, का जसजसा तो आपल्या गायनांत रंगत गेला, तसतसा त्याचा आवाज रस्त्यावरच्या लोकांनाहि स्पष्ट ऐकू येऊ लागला. आतासारखी लाऊड स्पीकरची गरज त्या काळी कोणालाच नसे.
लो. टिळकांच्या खटपटींनी यंदा रायगडावर शिवाजी महाराजांचा उत्सव फारच मोठ्या प्रमाणावर आणि थाटामाटात करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी दाजीसाहेब खरे यांची योजना होती. मुंबईचे बहुतेक पुढारी रायगडाला गेले होते, तरी शांतारामची चाळ आणि काळ्या रामाचे मंदिर येथे हा उत्सव साजरा करण्याची जबाबदारी पाटणकर संगीत नाटक मंडळीचे मालक माधवराव पाटणकर यांनी घेतली होती. तेच स्वत: काळ्या रामाच्या मंदिरात आपला स्वकृत पोवाडा गाऊन हा उत्सव साजरा करीत होते.
माधवराव पाटणकर आणि त्यांचे ते नामांकित नाटक सत्यविजय या गोष्टी महाराष्ट्राच्या रंगभूमीच्या इतिहासांत अजरामर अशाच आहेत. माधवरावनी आपली नाटक मंडळी २५-३० वर्षे अखंड चालविली आणि सत्यविजय नाटकाचे हजाराच्यावर प्रयोग केले. मुंबईच्या पिली हौस मोहोल्यांत रिपन थेटरात पाटणकर कंपनीची नाटके व्हायची. अनेक वेळा बॉम्बे थेटरात स्वदेशहितचिंतक आणि जवळच्या एलफिन्स्टनमध्ये किर्लोस्कर यांच्या छावण्या असल्या, तरी पाटणकरांच्या सत्यविजयाला प्रेक्षकांचा हमखास तोबा उडायचा.
माधवरावांची नाटके बहुजन समाजासाठी असत आणि त्यांची रचना अगदी बालबोध नि रसाळ असे. माधवराव उत्कृष्ट दर्जाचे कवि होते. नाटकांशिवाय त्यांची इतर पुष्कळ स्फुट कविता वरचेवर निरनिराळ्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत असे. पाटणकर संगीत मंडळी म्हणजे एक अलिजा बहाद्दरी थाटाचे राजविलासी संस्थानच होते. आल्या गेल्याचा नि अनाथ अपंगाचा परामर्ष कंपनीच्या बिऱ्हाडी अखंड चाललेला असे. माधवरावांसारखा दिलदार वृत्तीचा आणि सढळ हाताचा दानशूर कर्ण, नाटक मंडळ्यांच्या क्षेत्रांत मला तरी दुसरा आढळला नाही.
महाराष्ट्रांत अशी एकही सार्वजनिक संस्था नव्हती की जिला माधवरावाचे निदान पांच रुपयांचे तरी दान पडलेले नाही. हवे त्याने यावे, विनंती करावी लागेल ते घेऊन जावे, असा तडाखा सारखा चाललेला, माधवराव म्हणत – "आम्ही काय कोणाला देणार? श्री दत्त महाराजांचा मी आहे कोठावळ्या. तेच दातात नि मागायला येतात. तेच देणारे नि घेणारे. मी नुसता निमित्तमात्र." नाट्यव्यवसायातला कोणीहि इसम अथवा एकादी कंपनी कोठे अडचणीत अडकून पडल्याची बातमी येतांच, माधवराव त्यांना तात्काळ पैशाअडक्याची मदत पाठवायचे. अशा दोन तीन कंपनीवाल्यांना सोडवून आणून, स्वत:चे खेळ बंद ठेवून, त्यांचे खेळ स्वत:च्या खर्चाने करवून त्यांना मार्गाला लावल्याची उदाहरणे मी स्वत: पाहिलेली आहेत. माधवरावांचे वक्तृत्त्व आणि भाषणशैलीचा ओघ एतका विलक्षण प्रभावी असे की त्यापुढे शिवरामपंत परांजप्यांच्या वक्तृत्वाने आदराची मान झुकवल्याचा प्रसंग माझ्या आठवणीत आहे.
माधवरावाचा महाराष्ट्राभिमान दुर्दम्य होता. अखिल भरतखंडांत महाराष्ट्राचा दरारा सर्व क्षेत्रांत चढता वाढता असावा, ही त्यांची महत्वाकांक्षा ते नेहमी बोलून दाखवीत असत आणि तसे त्यांचे वर्तनहि असे, "मऱ्हाठा जाईल तेथे त्याला इतरांकडून सन्मानाची सलामी" मिळालीच पाहिजे. अरे आम्ही श्री शिवरायाचे नांव सांगणारे, श्रीकृष्णाची गीता गाणारे, जाऊ तेथे विजय आमचाच. सत्कार्याला आत्मविश्वासाने हात घाला श्रीदत्तमहाराज आपला सत्यविजयच करणार."
सातव्या एडवर्डाच्या राज्यभिषेकाचा दिल्लीला कर्झनने मोठा उत्सव केला. अलिकडच्या काळात हाच मोठा राज्याभिषेकोत्सव असल्यामुळे, सगळा हिंदुस्थान दिल्लीला धावला. आपणहि आपली नाटक मंडळी घेऊन दिल्लीला जावे आणि तेथे जमलेल्या राजेरजवाड्यांना आणि जनतेला मऱ्हाठी रंगभूमीचा प्रभाव नि महिमा दाखवावा, असा माधवरावांनी बेत ठरवला आणि खटपट सटपट करून एका मोक्याच्या नाक्यावर थेटरासाठी जागा मिळविली. मऱ्हाठी नाटके करणारी मऱ्हाठी नाटक मंडळी दिल्लीसारख्या परप्रांतात घेऊन जाण्याचा अग्रमान माधवराव पाटणकरांचा आहे. उत्सवाच्या क्षेत्रात हजारो रुपये खर्च करून प्रचंड थेटर बांधले आणि कंपनीची छावणी दिल्लीला नेली. कर्झनने उत्सवाच्या छावणीचा प्लॅन घोड्याच्या नालासारखा रचला होता. तेवढ्या आकारात सगळ्या राजेरजवाड्यांच्या छावण्या, प्रदर्शने, कचेऱ्या वगैरे थाटल्या होत्या. कार्यक्रम तर काय, तासातासाला सारखे चाललेले. आतषबाजीचे प्रयोग रात्रीचे चालायचे नि सगळ्यांनी तेथे हजर रहाण्याचे सरकारी हुकूम. संध्याकाळ झाली म्हणजे थंडी अशी बेफाम कडाडायची का घोंगड्यांबाहेर तोंडे काढण्याची पंचाइत! मग रात्रीचा बाहेर पडतो कोण मरायला! आणि इकडे तर माधवराव बसले थेटर शृंगारून दिव्यांच्या लखलखाटात प्रेक्षकांची वाट पहात!
पहिली रात्र, पहिला प्रयोग सत्यविजय. साडेनऊ झाले तरी थेटराच्या आजूबाजूला एक जिवंत माणूस फिरकलेले दिसे ना. नटवर्ग रंगून तयार. सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. कारण या दिल्लीच्या धाडसापायी हजारो रुपयांची चांदी झालेली होती. शिवरामपंत जोशी (पाटणकरांतले अद्वितीय विनोदी नि विदुषकी नट) म्हणाले, "तरी मी म्हणतच होतो का या दिल्लीच्या भानगडीत पडण्यात शहाणपणा नाही. लोक आले नाहीत तर नाटक कसे होणार?" पण माधवराव मात्र नेहमी सारखेच आनंदी उत्साही होते. ते शिवरामपंताकडे पाहून खूप खो खो हांसले आणि म्हणाले - "ए पिशाच्चा, आजपर्यंत सत्यविजयाचा अखंड विजय झाला, तो काय तुझ्या माझ्या नाट्यकौशल्याने होय? मुळीच नाही. माणसाने कर्तृत्वाची अशी शेखी मिरवू नये. करते करविते श्री दत्त महाराज समर्थ असता आपण कां उगाच तोंडे रडवी करावी? पाटणकर कंपनीचा खेळ कधी बंद पडत नसतो. चला, ठेवा शिवरायांची नि दत्त महाराजांची मूर्ति रिझर्व खुर्चीवर. तेथे आरती करा. तिसरी घंटा ठोका आणि महाराजांच्या जयजयकारांत करा नाटकाला आरंभ."
रिकाम्या थेटरांत सत्यविजयाचा प्रयोग इथपासून इतिपर्यन्त नेहमीसारखाच झाला. असे तीन रात्री झाले. माधवरावाचा आत्मविश्वास आणि दत्तभक्ति लवमात्र चळली ढळली नाही. चवथ्या रात्री अलिजा बहाद्दर माधवराव शिंद्यांची स्वारी सहजगत्या "हा इकडे कसला लखलखाट?" म्हणून चौकशी करीत लवाजम्यानिशी थेटरावर येऊन दाखल झाली. पहातात तो काय! थेटर रिकामे! समोर शिवाजीची नि दत्तात्रयाची मूर्ति आणि रंगभूमीवर माधवराव मारे तानावर ताना घेऊन गाताहेत! शिंदे सरकारनी चौकशी केली. सगळा प्रकार कळला. दुसऱ्या रात्री मुद्दाम स्वत:साठी खास खेळ ठरवला. अनेक महाराष्ट्रीय मंडळी, इतर राजे सरदार वगैरे बरोबर घेऊन महाराजांची स्वारी वेळेवर दाखल झाली. खेळ बेफाम रंगला ग्वालेरला चला" असे आमंत्रण दिले. त्याप्रमाणे पुढे सर्व काही यथासांग घडले.
माधवराव आपल्या मंडळींना म्हणाले - "समजलात आता. माणसाने कर्तृत्वाचा अभिमान टाकला तर श्रीदत्त महाराज त्याचे काही उणे पडू देत नाहीत. दिल्लीचे धाडस आम्ही त्यांचे नि शिवरायाचे नांव घेऊनच केले. ते त्याच परमेश्वरांनी पार पाडले, आता बांधा बिछायति नि चला ग्वालेरीला."
****
आठवण ७ वी
रविवार ता. १३ दिसेंम्बर १९४२
केशवरावाच्या भाग्याचे विश्वकर्मा जनुभाऊ
-केशवराव भोसले
कै. गोविंदराव देवल मास्तरांच्या शारदा नाटकाच्या भरअंमदानीचे दिवस होते ते. किर्लोस्कर आणि स्वदेशहितचिंतक या दोन नाटक मंडळ्यांमध्ये शारदेच्या प्रयोगांची गोड चुरस लागलेली असे. कोणाला कोण खेळ उत्तम, याचा निर्णय देणे पट्टीच्या रसिकांनाहि कठीण जात असे. किर्लोस्कराकडे शारदा, कोदंड वगैरे थाट उत्तम, तर स्व. हि. कडे तो तसाच असून शिवाय मद्रेश्वर दीक्षित दणकेबाज रावजी गोपाळ म्हसकरांची ही भूमिका केवळ अविस्मरणीय अशीच होत असे. पुढेपुढे तर स्व. हि. नी शारदेच्या प्रयोगांत किर्लोस्करांना मागे टाकले.
स्व. हि. कडे शारदेचे काम सुरुवातीला कृष्णा देवळी नावाच्या मुलाकडे होते आणि वल्लरीचे काम केशव नावाचा एक झिपटा लुकडासा पोरगा करीत असे. या मुलाची आई त्यांच्या थोरल्या भावासह कंपनीतच कामधाम करून रहात असे. केशवचे शिक्षण काहीच नसले तरी तो मोठा चलाख, चौकस आणि कमालीचा एकपाट्या होता. तालमीत अथवा रंगभूमीवर कोणी कसलीहि अवघड तान घेतली का लगेच तो तिची नक्षल हुबेहूब वठवून दाखवायचा. हव्या त्या पात्राची नक्कल त्याला नेहमी पाठ असे आणि वेळी रंगभूमीवर शेजारचे पात्र अडखळले, तर तो चटकन त्याला `प्रॉस्टिंग` करायचा. लहान वय, तेव्हा स्वभाव मनस्वी खेळाडू हातावर पाणी पडले का स्वारी लोखंडी चाक घेऊन गांवातल्या इतर पोरांबरोबर रस्त्यावर हुँदाडायला पसार शोधता सापडायचा नाही.
जनुकर निंबकर - विसरला महाराष्ट्र विचाऱ्याला! आणि रंगभूमीच्या विद्यमान पुरस्कर्त्याना तरी त्याची आठवण कशाने नि का व्हावी? स्व हितचिंतकाच्या यशाची नि ऐश्वर्याची चैतन्यशक्ति म्हणजे जनुभाऊ. दिसायला साधेमोळे. पण `वेष धरावा बावळा, अंतरी मात्र नाना कळा` अशी त्यांची वृत्ति, स्वरज्ञानाच्या बाबतीत जनुभाऊचा हात धरणारा त्यावेळी कोणी नव्हता आणि आज तरी तितका कसबी मला कोणी दिसत नाही. स्व. हि. च्या प्रसादाने तयार होऊन महाराष्ट्रात चमकलेल्या अनेक संगीत नटताऱ्यांच्या भाग्याचे नि लौकिकाचे विश्वकर्मा जनुभाऊ होते. केशवराव भोसले, किशाबापू काशीकर (दिनकर चिमणाजी देशपांडे, बी.ए., एलएल.बी.) (ता. १ आक्टोबर १९४८ रोजी काबा काशीकराच्या झटक्याने कोल्हापूर कालीन झाले हे नमूद करताना मला होत आहे. बाच्या या वर्षी हे रंगभूमीवर आले आणि सात वर्ष शिक्षण घ्यायला लागले ५ वर्षा बी.ए. पुढे २ वर्षात एलएलबी साहित्यावर अनेक नामांकित ग्रंथ लिहिले असून, गेली काही `संधिकाल सामाहिक’हि चालविले, दिनकर चिनगाजी देशपांडे हे त्यांना निपिता-पुजासारखा होता.)
विष्णुपंत पागनीस यांच्या रंगभूमीवरील यशाचे गुरू जनुभाऊ निंबकर, फार काय. पण कृष्णराव गोरे, राजारामपंत सोहोनी यांच्याहि गायकीला स्पष्ट सुबोध आणि ठसकेदार वळण लावण्याची कामगिरी जनुमाऊनीच केलेली आहे. भिन्नभिन्न रागांचा निरनिराळ्या मनोविकारांच्या आविष्करणात कसा उपयोग करावा, यांत जनुभाऊंचे प्राविण्य कौतुक करण्यासारखे होते. माणसाच्या अंगच्या विवक्षित गुणाला चटकन ओळखून त्याच्या उत्कर्षाने दगडाचा देव बनविण्याची हातोटी फक्त जनुभाऊची. तिनेच केशवाचा केशवराव भोसले कसा केला ती कथा आता वाचा.
वर्ष आठवत नाही, स्व. हि. ची छावणी कोल्हापुरला होती. शनिवार रविवार शारदेचे प्रयोग धुमधडाक्याने चाललेले होते. गुरुवारी दुपारी शारदेचा पार्टी कृष्णा देवळी तापाने आजारी पडला. शुक्रवारी संध्याकाळी डॉक्टरानी न्यूमोनिया `डिक्लेअरला.` खेळाच्या जाहिराती तर सकाळीच लागल्या. शारदेचा पार्टी भयंकर आजारी नि कंपनी खेळ कसा करणार? ही बोलवा सर्व शहरभर फैलावली. शनिवारी सकाळी खुद शाहू महाराज कंपनीच्या बिन्हाडी आले. कृष्णाजी प्रकृति पाहिली. पेशंटला हालचाल करता येणार नाही असे डॉक्टराने खडसून सांगितले. "आजचा खेळ बंद ठेवा" महाराज म्हणाले. गंभीर खर्ज स्वरांत मॅनेजर म्हसकर उद्गारले. “स्वदेशहितचिंतकाचा जाहीर झालेला खेळ कधि बंद रहात नाही." डॉक्टर किंचित चिडून म्हणाले. अशा अवस्थेत पेशंटला स्टेजवर नेऊन काय ठार मारायचा आहे?
म्हसकर- याला स्टेजवर न्या, असे माझे म्हणणे कुठे आहे? पण काही झाले तरी मला खेळ बंद
ठेवता येणार नाही. तो झालाच पाहिजे.
महाराज- असे म्हसकर, मुख्यपार्टीच्या बदला दुसरा कुणी आडूमाडू उभा करून खेळाचा
विचका का करायचा आहे तुला?
म्हसकर- हा प्रश्न तालीम-मास्तरांचा आहे, सरकार त्यानी करावी योग्य ती व्यवस्था. मी खेळ बंद ठेवणार नाही. वेळ पडली तर मिशा भादरून दीक्षिताऐवजी शारदेचे काम मी करीन, पण खेळ बंद ठेवणार नाही..
म्हसकरांच्या मिशा म्हणजे एक प्रचंड प्रकरणच होते ते भादरण्याची प्रतिज्ञा ऐकताच महाराजासकट सगळे खो खो हासले. पण जनुभाऊ मात्र बरेच गंभीर दिसले. तेच तालीम मास्तर अर्थात् योग्य पार्टीची योजना करण्याची जबाबदारी त्यांचेवर. शिवाय म्हसकरांनी ती बोचक शब्दात त्याना जाणवलेली!
बराचवेळ गंभीर मुद्रेने शतपावली केल्यावर, जनुभाऊ एकदम मोठ्याने ओरडून म्हणाले, "कुठे गेलाय रे केशव? त्याला बोलाऊन आणा पाहू लवकर." केशवला शोधायचे म्हणजे सगळ्यांची धावाधाव त्याची ती लंगोटीची चावडी फडाफडा उडत आहे, उघडा बोडका, हातात चाक घेऊन गावातल्या पोरांबरोबर तो कुठे भटकत जायचा त्याचा नेम नाही. पण आज तो जवळच एका गल्लीत सापडला. जनुभाऊ बोलावताहेत असे कळताच, स्वारी धडपडत आली. चाक दिले अडगळीत फेकून आणि तशीच धुळीभरली राहिली येऊन जनुभाऊ पुढे उभी
जनुभाऊ- शारदेची नक्कल आहे तुझी पाठ?
केशव- शारदेची आहे, कोदंडाची आहे, सगळे नाटक आहे पाठ, जनुभाऊ, मला कोदंडाचे काम द्या. दाखऊ करून आता?
दूर एका झोपड्यात तबला पेटी गेली. जनुभाऊनी केशवला जवळ घेऊन तब्बल तीन तास संगीताची तालीम घेतली. एका ठराविक पदावर मात्र त्यानी विशेष करामत वटऊन घेतली. रात्री थेटरावर साशंक प्रेक्षकांची गर्दी उसळली. वल्लरीचा पार्टी केशव आज म्हणे शारदेचे काम करणार! त्याचे `तरुण कुलीन गोरा` हे पदच तेवढे ऐकावे नि त्यातला वात्रटपणा पहावा!
थेटर चिक्कार भरले. स्वता शाहूमहाराज खेळाला आले. तिसऱ्या घंटीला पडदा वर गेला. `बघुनि त्या भयंकर भूता म्हणत शारदा (केशव) आली. वल्लरीच्या नाचऱ्या नि खेळकर वृत्तीच्या जागी गंभीर वृत्तीचा केशव पाहून लोकाना आश्चर्य वाटले. आता `मूर्तिमन्त भीति उभी पद आले. दोन्ही विंगातून भीमपलासाचे खर्ज स्वर अत्यंत हळूवार येऊ लागले, शारदा खिन्न मुद्रेने आकाशाकडे निश्चळ टक लावून पहात एकटीच उभी आहे. आजवर हे पद इतर पदांप्रमाणेच सपाटेबंद साच्या तालांत नि ठेक्यांत गायले जात असे. पण आजचा प्रकारच काही न्यारा! कमाल ठायीत सुरुवात झालेली. शारदेने पेटीच्या स्वरात आस्ते भूSS ध्वनि मिसळला.
भीमपलासात करुण स्वरांचे ध्वनि असे काही मिश्र होत गेले का सारे प्रेक्षक तल्लीन झाले. जिकडे तिकडे गंभीर शांतता पसरली. पद रंगत गेले. स्वरातल्या कंपांनी श्रोत्यांची हृदयेहि कंपित होत गेली. पद संपताच वन्समोरचा टाळ्यांचा प्रचंड गडगडाट उडाला. आजवर कोणी ऐकले नाही अशी या पदाला आकर्षक मुरड घालुन जनुभाऊनी केशवकडून `मूर्तिमंत` पदाला एक अभूतपूर्व रंग चढउन, केशवच्या भाग्याचा पाया घातला. बारा वेळ वन्समोर झाले. स्वता जनूभाऊ विंगेमध्ये उभे राहून विवक्षित हावभावानी नि खुणानी केशवला उत्तेजन देत होते. वारा वेळ वन्समोर होताच, जयिष्णु भावनेने जनुभाऊ शेजारच्या एका नोकराला म्हणाले, "कुठे आहेत रे तुमचे मॅनेजर? बोलाव त्यांना" जनुभाऊना म्हसकरांचा टोमणा जाणवतच होता. म्हसकर येताच ते गोरेमोरे होऊन त्याना म्हणाले - "डोळ्याना दिसतंय का काही? माझ्या पोराचा काय जीव घ्यायचा आहे वाटतं तुला?" म्हसकरानी सस्मित आदराने जनुभाऊना प्रणाम केला नि तसेच तडक स्टेजवर गेले. हात जोडून प्रेक्षकाना म्हणाले “आपल्या उत्तेजनाबद्दल कंपनी आभारी आहे. पण मुलाच्या जिवाकडे पाहून वन्समोरचा आग्रह झाला इतका पुरे." शाहू महाराज मोठ्याने ओरडून म्हणाले “आता एकदाच वन्समोर रे म्हसकर"
मूर्तिमंत भीति उभी या पदाच्या नव्या मुरडीने जनुभाऊनी केशवला असामान्य यशाचा मार्ग दाखवला. त्यानेच तो केशवचा केशवराव भोसले झाला. केशवचे नुसते `मूर्तिमंत` पद एकण्यासाठी पांच पांच रुपये देवून पिटात उभे राहिलेले लोक मी पाहिलेले आहेत. केशवरावला जनुभाऊनी खरोखरच एक `तारा` बनवले आणि अजोड तेजाने रंगभूमीच्या क्षेत्रांत थोडा वेळच चमकून हा तारा आला तसाच झपकन लुप्त झाला! मूर्तिमंत भीति उभी` आणि `केशवराव भोसले ही महाठी रंगभूमीची दोन अजरामर स्मारके आहेत.
केशवरावच्या गाण्याचे नमुनेसुद्धा नीटसे मागे राहिले नाहीत. एकदा निजामी हैदराबादला कंपनीचा मुक्काम असतांना एच. एम. व्ही. वाले कोणी लोक तेथे आले असताना, केशवरावच्या बारा गाण्यांचे रेकॉर्डिंग झाले होते. रेकॉर्डसहि बाहेर पडली होती. पण त्या काळी ही रेकॉर्डिंगची कला बाल्यावस्थेत असल्यामुळे आणि केशवरावाला साथीदारहि चांगले न मिळाल्यामुळे, त्या रेकॉर्डचा फारसा
गाजावाजा झाला नाही. शिवाय केशवराव हयात होते तोंवर, जातिवंत गाणे ऐकण्याच्या संधीपुढे, लोकानी ग्रामोफोन रेकॉर्डाची फारशी पर्वा केली नाही, तर त्यात नवल कशाचे? तो काळ तसाच होता.
****
आठवण ८ वी
रविवार ता. २७ डिसेंबर १९४२
जस्टिस रानड्यांनी मुंबईचे सोनापूर वांचवले
हिंदुत्वनिष्ठा नि हिंदुत्वाचा अभिमान या दोन भावना हिंदु महासभेने आणि तात्याराव सावरकरांनी अलिकडेच जन्माला घातल्या, असा एक सार्वत्रिक भ्रम आहे. ४०-५० वर्षापूर्वी मुंबईचे गिरगांव म्हणजे हिंदुत्वाभिमानाचा जागताज्योत बालेकिल्ला होता. तेथे दर आठवड्याला पुराणे, व्याख्याने कीर्तने, प्रवचने, काही ना काही कार्यक्रम अखंड चालू असे. जस्टिस रानडे, डॉ. भालचंद्र भाटवडेकर, रावसाहेब विनायक कोण्डदेव ओक, बॅरिस्टर दळवी, दाजी आबाजी खरे प्रभृति पुढाऱ्यांनी चालविलेला `हिंदू युनियन क्लब` म्हणजे गिरगांव बैंक रोडवर हिंदुत्वाचे एक मध्यवर्ति केंद्र असे. त्याच्या हेमंत व्याख्यानमालानी विचार- जागृतीचे कार्य चालू ठेवलेले असे. या व्याख्यानासाठी नागपूर, सोलापूर, पुणे, बेळगांव, कोल्हापुराहून मोठमोठे हिंदू पंडित येत असत. या क्लबात स्थानिक गुर्जर पुढारी नि व्यापारीसुद्धा तनमनधनाने भाग घेत.
त्या काळी मुंबईला क्रिश्चन मिशनचे बंड फार. बाटवाबाटवीचा व्यापारहि जोराच चाले. क्रिस्ती उपदेशक आणि हिंदुत्वाचे वक्ते यांच्यांत दर रविवारी कोठेना कोठे मोठे वादहि होत असत आणि ते वाद ऐकायला नि पाट्र्याची हुर्यो उडवायला माझ्यासारख्या त्या वेळच्या अल्लड पोरांचा तुटवडा मुळीच पड़त नसे, प्रार्थना समाजाच्या दिवाणखान्यात रानडे, भांडारकर, चंदावरकर प्रभृतींची प्रवचने दर रविवारी अखंड चालू असत. त्यानी हिंदुत्व-प्रसाराची कामगिरी काही थोडी थोडकी बजावलेली नाही. दसऱ्याच्या मिरवणुकीचा गिरगावातल्या हिंदूंचा थाट आजसुद्धा तसा पहायला मिळत नाही. पूर्वी सगळे हिंदू एका विशेष जिव्हाळ्याने भराभर एकवट जमत असत. आजला सगळ्या गोष्टी `करायच्या म्हणून करायच्या अशा यांत्रिक धाटणीने होत असतात.
बॅरिस्टर दळवी म्हणून एक वृद्ध गृहस्थ असत. ते बहुधा नेहमी वक्त्यांचे आभार मानायला उठायचे. त्यांची एक दोन वाक्ये नमुन्यासाठी आठवणीने देतो. ते म्हणायचे. "हिंदू निघाला सिंधूपासून हिंदू म्हणजे सिंधू. त्याच्या पोटात सारं गडप झालं पाहिजे. बूक, टेबल, स्कूल, रोड, कोट, वगैरे इंग्रजी बाबी आम्ही पुऱ्या हिंदू करून टाकल्या. आता कोणी बुकाला पुस्तक आणि टेबलाला मेज म्हणायच्या यातायातीत पडत नाही. हिंदू हॉटेल, वा! काय छान संधि बनला हा! हॉटेलहि आता हिंदू बनले. जगांत जे जे आम्हाला उत्तम उपयोगी आणि हितकारक दिसेल आढळले ते आम्ही हिंदुत्वाच्या मुलाम्याने पार आपलेसे करून टाकले पाहिजे. हिंदू हा ऑल अॅबसॉर्बण्ट (सर्वाकर्षी) असला पाहिजे, जगांतल्या उत्कृष्ट गोष्टी आत्मसात् करूनच हिंदूंचा हा प्रचंड सिंधू आजवर जगलेला आहे आणि यावत्चंदिवाकरी असाच जगेल."
मुंबईचे प्रसिद्ध नागरीक पुढारी सर मंगळदास नथूभाई याना क्रिस्ती बनविण्याचा एका पायाने यत्न केला. त्याला शेटजीने एका सभेत जाहीर उत्तर दिले "अरे, आम्ही क्रिश्चन आहोत. तुमच्या बाप्तिस्म्याने अधिक काय होणार? पण बाबा, ईश्वराने मोठी खैर केली का तुम्हा इंग्रजावर क्रिस्ती धर्माच्या दीक्षेचा छाप पाडला! नाहीतर एव्हाना तुम्ही जगाची हाडेहाडे किंरे काढली असती." (But Think God that you English were converted to Christianity, or you would by this time have eaten up the world to the bone.)
४५ वर्षांपूर्वी क्वीन्स रोड म्हणजे दर सायंकाळी मोठमोठ्या हिंदी नि गोऱ्या हापसरांच्या नि व्यापाऱ्यांच्या नयनमनोहर घोड्यांच्या गाड्यानी नुसता गजबजलेला असे. आजच्या मंडळीना घोड्यांच्या गाड्यांची कल्पना म्हणजे व्हिक्टोरियाच्या पलिकडे फारशी असणारच नाही. पण त्या वेळच्या त्या निरनिराळ्या थाटामाटाच्या गाड्या. ते डौलदार प्रेक्षणीय घोडे. एकका जोडीला पांच पांच दहादहा हजार रुपये पडायचे. त्यांचा तो झगझगता शृंगार गाड्यांच्या मागे जरतारी पोषाख करून उभे राहिलेले ते दोन दोन सइस `पैस पैस` म्हणून त्यांच्या ललकाऱ्या चाललेल्या आहेत, वळणावर ते घडाघड उड्या घेताहेत आणि चटकन घोड्यांच्या लगामी घरून गाड्या वळवताहेत आणि लगेच धावत्या गाडीमागे पटापट उड्या मारून उभे रहाताहेत. अशा शेकडो रथवजा गाड्यांचा तो प्रेक्षणीय झगमगता दिमाख पहायला हजारों लोक चर्चगेटापासून विल्सन कॉलेजपर्यन्त दुतर्फा झुंडीने रोज उभे असायचे. आज मोटारींची धामधूम केवढीही असली, तरी तो घोड्यांच्या गाड्यांचा जुना थाट नि ऐश्वर्य त्यांत मुळींच नाही.
क्वीन्स रोज हवा खाण्याचा एकच राजरस्ता, त्याला लागूनच हिंदूचे सोनापूर स्मशान. आंत जळणाऱ्या प्रेतांची दुर्गन्धी नि धूर वरचेवर रस्त्यावर चुकूनमाकून यायचा नाही असे नाही. त्यावेळी सोनापुरला काळ्या दगडांची बुटकी मितच काय ती होती. म्हणून कित्येक वेळा धुरातून उंच उंच उडणाऱ्या कोजळ्या वाऱ्याच्या झोताने रस्त्यावर यायच्या. गोया हपिसरांची नि त्यांच्या मडमांची तब्येत यामुळे नाराज होऊ लागली. "आम्ही विक्टोरिया राणीचे जातभाई! हिंदुस्थानचे राज्यकर्ते! आम्ही हवा खायला बाहेर पडलो का हिंदूंच्या या मसणवटीचा काय म्हणून हा घाणेरडा त्रास? बस्स. हे सोनापूर येथून उठवलेच पाहिजे."
मुंबईचा सगळा गोरा समाज एकाकी बिथरला. करतील ते कारण नि बांघतील ते तोरण, असा त्या काळी त्यांचा अधिकार जोरा नि दिमाख होता. त्याना विरोध करायची एकाहि हिंदी आदमीची वा समाजाची छाती नव्हती. म्युन्सिपालटीत वा कौन्सिलांत लोकमत ही चीज अडून पैदाच झालेली नव्हती. सरकार "मायबाप" आणि गोरे हफिसर व्यापारी त्यांचे हितचिंतक सल्लागार राज्यकर्त्यांच्या जातभाईना अमूक एक गोष्ट नडते म्हटली का ती ताबडतोब उखडली जायचीच.
गव्हर्नराकडे गोऱ्यांचे अर्ज नि शिष्टमंडळे जाऊन धडकली. चौकशीचा फार्स सुरू झाला. गोरे लोक इतके मस्तावले का हिंदू पुढाऱ्यांना ते उघड धमकी देऊ लागले. “बघतो आम्ही तुमचे स्मशान या रस्त्यावर कसे रहाते ते, गव्हर्नरने ते उखडले नाही, तर आम्ही आमच्या अधिकारांत ते उखडून टाकू. पण छीन्स रोडवर ही महामारी आता ठेवणार आम्ही ठेवणार नाही."
सगळे हिंदूजन चिंताक्रांत झाले. प्रश्न धर्माचा, परंपरेचा आणि त्यातल्या त्या इभ्रतीचा । नाना शंकरशेटनी स्थापन केलेले सोनापूर आता स्थानभ्रष्ट होणार! यात त्या महान थोर पुरुषाची नि सगळ्या मुंबईकर हिंदूंची अप्रतिष्ठा गोर लोक तर बोलल्यासारखे करायला मागेपुढे नाही पहाणार. प्रतिकार करावा तर त्यात काही अर्थच दिसेना. नुसता निषेध करून तरी काय होणार? सभेतला ठराव चिटणीसाच्या दप्तरातच रहाणार आणि पुढे गेलाच तर कचऱ्याच्या टोपलीत पडणार एकूण, सोनापूरावर पक्केच गण्डांतर आले हिंदूचे सोनापूर आता काही क्वीन्सरोडवर रहात नाही. ते वरळीला जाणार!
जस्टिस रानड्याना सारी मुंबई `रावसाहेब` या लाडक्या नावाने ओळखत असे. गिरगावात हिंदूंच्या सभांवर सभा झाल्या. सगळे गुर्जर बांधव त्वेषाने पुढे आले. पारशी बांधवसुद्धा फुरफुरून पाठिंब्याला घावले.
सत्तेपुढे शहाणपण चालणार नाही, हे सर्वच ओळखून होते, अशा वेळी युक्तिप्रयुक्तीने आणि कुणाच्या तरी जबरदस्त वजनाने साधले तर हे कार्य साधणार होते. असा पुढारी कोण काढावा? त्याची भवति न भवति होऊन, रावसाहेबांकडे (जस्टिस रानड्यांकडे) सगळ्यांचे शिष्टमंडळ गेले.
"बंधूजन हो, घाबरू नका. माझे या प्रश्नाकडे पुरे लक्ष आहे. काही झाले तरी सोनापुरला मी हलवू देणार नाही." महर्षीच्या गंभीर स्वरात जस्टिस रानडे म्हणाले. "तुम्ही निर्धास्त रहा. आज हे मस्तवाल गोरे आमचे सोनापूर उठविणार, उद्या म्हणतील मुंबापुरीचे देऊळ हालचा नि करा तेथे क्रिकेट ग्रौण्ड, म्हणून काय आम्ही मुकाट्याने सगळे मानायचे? ते होणार नाही."
जस्टिस रानडे हिंदूंचे पुढारी म्हणून सोनापुराचा प्रश्न घेऊन गव्हर्नराच्या भेटीला गेले. त्यानी स्थानिक गोऱ्या पुढाऱ्यानाहि भेटी दिल्या. "वादाचा मुख्य मुद्दा काय, तर स्मशानातला घाणेरडा चूर अथवा किटाळी वरचेवर क्वीन्स रोडवर येत असल्यामुळे, ती आरोग्याला विघातक आहेत, त्यांचा बंदोबस्त करता येईल. तो आम्ही पंधरा दिवसांत करतो. पण सोनापूरच जागचे हालवा म्हणाल तर ते मात्र कदापि होणार नाही."
एका संधाकाळी सोनापूरच्या बाहेर हिंदू पुढारी नि गोरे पुढारी यांच्याशी जस्टिस रानडे यानी मोठ्या धीरगंभीर परंतु ठोसरपणाने चर्चा केली आणि मूळ काळ्या दगडाच्या कुसावर आणखी सहाफूट उंचीची लांबलचक भिंत बांधून आम्ही हा घाण धुराचा प्रश्न कायमचा मिटवतो` अशी तडजोड काढली. जागच्या जागी वर्गणीचे आकडे भराभर पडले आणि पंधरा दिवसांत जुन्या कुसावर पांढऱ्या दगडांचे सहाफूटी कूर उभारून जस्टिस रानडवानी सोनापुरचे स्थलांतर वाचवले.
वाचक हो, एकदा सोनापूरच्या त्या लांबलचक उंच भिंतीकडे मुद्दाम जाऊन पहा, जस्टिस रानड्यांचे ते कट्टर हिंदुत्वाचे चिरजीव स्मारक आहे. त्या सहाफुटी कुसाने मुंबईकर हिंदूंचा स्वाभिमान जगवलेला आहे. आमची प्रतिष्ठा सांभाळलेली आहे. नाना शंकरशेटच्या कीर्तीला त्या भिंतीने उचलून धरलेले आहे. ती भीत अहोरात्र हिंदुत्वाचा नि जस्टीस रानड्यांचा जयजयकार गर्जत असते.
****
आठवण ९ वी
मंगळवार ता. १६ फेब्रुवारी, १९४३
स्वदेशी चळवळीचे स्वदेशी शत्रू
सध्याच्या अन्नान्न अवस्थेत नफेबाजी हा एक मोठा स्वदेशी शत्रू असल्याचे दिसून येत आहे. हा रोग नवा नाही. फार प्राचीन आहे आणि व्यापारी पिंडाच्या लोकांत तर तो परंपरेने उतरलेला आहे. या नफेबाजीने स्वदेशी चळवळ कशी ठार मारली, याची एक आठवण सांगतो.
१९०५ च्या वंगभंगाने स्वदेशी नि बहिष्कार चळवळ उभ्या भरतखंडात मोठ्या जोराने नि जोसाने फैलावली. महाराष्ट्रात तिचे नेतृत्व टिळकांकडे होते. त्यांच्या केसरी पत्राला प्रसाराचे खरे भाग्य याच वेळी लाभले. केसरीची मते भिन्नभाषी प्रांतियाना अगत्याने समजावी, या ईोंने निरनिराळ्या प्रांतातल्या पत्रांत केसरीच्या लेखांची भाषांतरे प्रसिद्ध होत असत. मुंबईला काळबादेवी रोडवर कोणी एक चांदलिया नावाचे गावठी पदव्यांचे डॉक्टर होते. त्यानी केसरीचे समग्र भाषांतर करून, दर बुधवारी सायंकाळी `गुजराथी `केसरी` नावाचे एक साप्ताहीकच चालू केले होते. एक `हिंदी केसरी` हि येथे निघत होता.
महाराष्ट्रभर गावोगाव टिळक परांजपे प्रभृतींची व्याख्याने सारखी झडत होती. शिवाय परप्रांतीय बाबू सुरेन्द्रनाथ वानर्जी, अरविंद बाबू घोष, लाला लजपतराय, विपिनचंद्र पाल वगैरे मंडळीहि व्याख्यानांच्या दौऱ्यावर आल्यामुळे स्वदेशी चळवळीच्या उन्मादाने सारे लोक बेहोष झाले. स्वदेशी आणि बहिष्कार या दोन शस्त्रांच्या जोरावर आपण हां हां म्हणता या विंग्रेजांना वठणीवर आणून बंगवू आणि स्वराज्य द्यायला भाग पाडू, असा आत्मविश्वास अखिल हिंदी माणसांच्या हृदयांत फोफाऊ लागला. खरोखरच तिकडे मॅनचेस्टरच्या गिरण्या भडाभड बंदहि पडू लागल्या होत्या आणि गोरे लोकमतसुद्धा कावरेबावरे झाले होते.
आजच्या घडीला आपल्या देशात परकी मालाच्या तोडीचा स्वदेशी माल तरी कोणता निपजतो, याचे जाहीर गमक अजमावण्यासाठी, आर्यन एज्यूकेशन सोसायटीत मास्तर असलेल्या
श्रीयुत वामनराव रामचंद्र जोशी, बी.ए.
या गृहस्थाने धडाडीचा पहिला प्रयत्न केला. त्यानी स्वदेशी वस्तूप्रचारिणी सभा स्थापन करून, तिच्या विद्यमाने दर रविवारी मुंबई शहरात नि उपनगरात स्वदेशी बाजार आणि जाहीरसभा भरविण्याचा प्रचंड उद्योग हाती घेतला. तसले उत्साही नि टापटिपीचे बाजार आणि त्या प्रचंड विचारक्रांतीकारक सभा, त्यानंतर मी कोठेहि पाहिल्या नाहीत. बाजारात दोन अडिचशे दुकाने हारीने थाटामाटात उभारली जायची. सभेला अध्यक्ष नि वक्तेहि मोठमोठे नामांकीत यायचे. कधि टिळक, कधि नाशिकचे बाबासाहेब खरे, रावबहादुर वसनजी खिमजी, नरोत्तम मुरारजी वगैरे. या रविवारी बाजार गवालिया तलावावर, तर पुढल्या रविवारी शीवच्या सॅनिटेरियमच्या भव्य पटांगणात, तर त्या पुढच्या माटुंग्याच्या शंकराच्या देवळाजवळच्या प्रशस्त फरसबंदी तलावाच्या काठावर, अशा जागा दर रविवारी बदलायच्या. हा सारा उद्योग वामनराव जोशी एकटे खपून जमवून आणायचे. बाजारात स्थानिक स्वदेशी मालवाले तर यायचेच. पण पुढेपुढे परप्रांतीय व्यापारीसुद्धा जमावाने आपली दुकाने थाटू लागले. जोशानी वर्षभर तरी मुंबईत सारे रविवार या कार्यक्रमाने चांगले दणाणविले होते.
कोणाची कल्पना नव्हती असले परदेशी मालाच्या तोंडात मारणारे स्वदेशी माल बाजारात दिसल्यामुळे, लोकाना मोठी धन्यता वाटली. हंगेरियन टोप्या इकडे होणेच शक्य नाही. पण त्यासुद्धा बाजारात तयार! अगदी विलायती तोडीच्या सावण तर काय-रिमेल ब्रौन विण्डसरच्या जोडीचे. बहुतेक सगळ्या विलायती परदेशी वस्तूंची जागा खास स्वदेशी वस्तूंनी भरून काढलेली पाहून मोठा आनंद वाटला ज्याला त्याला.
स्वदेशी साखरेचे तर गोठेच वण्ड मातले. हॉटेलवाल्याना स्वदेशी साखर मिळेना आणि स्वदेशाभिमानी चहाभक्त स्वदेशी साखरेशिवाय चहाचा घोट घेईनात. मात्र चहा कोणी ही सोडी ना! ही साखरची उणीव कावसजी पटेल टैंक रोडवरच्या एका महाधाडसी गुजराथी व्यापाऱ्याने भरून काढली, हॉटेलांत किंवा कोणाकडे चहा घ्यायचा, तर त्याला खिशातली पुडी काढून द्यायची नि सांगायचे, "ही घ्या साखर नि करा चहा. आम्ही परदेशी साखरेचा चहा पिणार नाही. तिच्यांत गाईचे रक्त नि हाडे असतात.` खास स्वदेशी साखरेचा चहा दुप्पट दराने लवकरच मिळू लागला. सिंगल कपाला अर्धा आणा.
एक `वसई साखर कंपनी लिमिटेड` निघाली. ठाकूरद्वारवर सांडू ब्रदर्सच्या दुकानावरच्या एका छोड्या माडीवर तिचे भांडवल जमवे हापीस थाटले गेले. येथे `सवाई माधवराव` या टोपण नावाचा एक गृहस्थ कारभारी होता. (याचे खरे नाव होते पेण्डसे.) या व्रात्य गृहस्थाला स्वदेशीचा एवढा काही उन्माद चढला, का साखर कंपनीला भांडवल जमविण्याच्या जाहिरातीचे लेख तो गलिच्छ नि बीभत्स भाषेत `राष्ट्रमत` दैनिकांत छापू लागला. त्यात तो हवी त्याची हवी तशी विटंबना करू लागला एकदा तर त्या व्रात्याने पालवा रोडवर प्रामुख्याने रहाणाऱ्या पाठारे प्रभू ज्ञातीच्या स्त्रियांच्या बदनामीचा एक लेख राष्ट्रमतात छापला. त्याचा मथळा होता- "हेच ते केस, माझ्या बायकोचे केस," एवढे कशासाठी? तर वसई साखर कंपनीला भांडवल जमविण्यासाठी आणि या घाऱ्या डोळ्यांच्या पारव्याच्या स्वदेशाभिमानाचे प्रदर्शन होण्यासाठी! अखेर ते प्रकरण कोर्टापर्यन्त गेले. पण इतक्यात राष्ट्रमताने राम म्हटला आणि तो सवाई माधवरावहि मुंबईतून काळे करून फरारी झाला.
स्वदेशी चळवळ निघण्यापूर्वी ज्या वस्तु फक्त परदेशांहूनच यायच्या त्या एका रात्रीत स्वदेशात कशा तयार होऊ लागल्या? याचे अनेक चिकित्सकाना मोठे कोडे पडले. हंगेरियन टोप्या लोकरीच्या लगदाच्या करतात. हा लगदा करण्याचा इकडे एकहि कारखाना नसताना, स्वदेशी हंगेरियन टोप्या बनतात कशा? लोकांच्या चौकशीला पोलिसांचे पाठबळ मिळाले आणि अखेर बैण्ड बाहेर फुटले. परदेशी टोप्यांचे नफेबाज व्यापारी, पोटाला चिमटा बसतो असे दिसताच लागले डोके लढवायला. त्यानी विलायती टोप्यांच्या आंतले अस्तराचे फक्त कापड नि चामडे बदलले. आणि छत्रपति शिवाजी, जगदंबा, टिळक यांची सोनेरी चित्रे छापलेल्या चामडी पट्ट्या आंत बेमालूम शिवून त्या टोप्या `स्वदेशी` `खास हिंदुस्थानमा बनेला माल म्हणून बेधडक बाजारात मांडल्या आणि दामदुप्पट दराने विकून आपला तळीराम गार केला.
माहिमचा एक साबणाचा कारखाना तर रिमेल विण्डसर साबणाच्या वड्यांची हजामत करून त्यावर पार्वति सोप वर्क्स चा छाप मारून विकायचा. मोहन बिल्डिंगमधल्या एका मराठा एजन्सीने तर एक बहारच केली. त्यांनी `स्वदेशी जगदंबा छत्र्या काढल्या. काड्या फक्त विदेशी, बाकी कापड वगैरे स्वदेशी, असा त्यानी पुकारा केला. पहिली स्वदेशी छत्री म्हणून दामदुप्पट दराने लोकांनी विकत घेतली. त्या वेळी वॉटरप्रुफ कापड इकडे होत नव्हते. या जगदंबा छत्रीवाल्यांनी मांजरपाटावरच कसले तरी काळे लुकण फासले होते. लोकानी पहिला पाऊस आंगावर घेताच बहार उडाली! लोकांचे कपडे तर काळे झालेच, पण तोंडानीहि तोच रंग पत्करला. तक्रारी केल्या तर तर छत्रीकारखानदार म्हणत "स्वदेशीसाठी एवढे सहन केलेचपाहिजे." सारांश, या छत्र्या लगेच बंद पडल्या. पण ते टोपीवाले आणि इतर अनेक `वाले` पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे, फसवेगिरीचे खटले होऊन भराभर डोंगरीवर हवा पालटायला रवाना झाले. नफेबाजांच्या या पापामुळे लोकांचा स्वदेशीवरचा विश्वास उडाला आणि स्वदेशी चळवळ दार मेली.
सगळ्यांत बिलंदर तो साखरवाला! त्याने तर जाहिरातींचा अक्षरशः भयंकर घुमाकूळ घातला होता. रोज ना रोज कोणा तरी थोरा मोठ्या माणसाची आपल्या स्वदेशी साखरेविषयी सर्टिफिकिटे छापून, आमच्या साखरेत अपवित्र वस्तू आहे, असे सिद्ध करून देणारास एक हजार रुपये बक्षिस. हे त्याचे पालुपद मोठया टायपांत सगळ्या पत्रांत बिनचूक झळकायचे. याने लाखो रुपयांची साखर विकली आणि त्यामुळे तो देशभक्तांत मोडू लागला.
त्यावेळी स्वदेशी साखरेच्या बाबतीत सर डॉ. भालचंद्र भाटवडेकर आणि केसरी किंवा त्याचा तो जहाल पक्ष यांत काही वादविवाद चालू होते. सर साहेबानी एकदा मणिलाल त्रिवेदीची स्वदेशी साखर आणवून पृथःकरणासाठी ती सरकारी केमिकल अनालायझरकडे पाठविली. त्याचा रिपोर्ट येतांच पोलिस खात्याची चक्रे पद्धतशीर हालचाल करू लागली. एके रात्री या स्वदेशी साखरवाल्या वखारीवर पोलिसांचा छापा गेला आणि पहाताच तो काय! मोरस साखर दळून तिच्यावर काही पद्धतीने गुळाचे पाणी मारण्याचा- देशभक्त मणिलाल त्रिवेदीचा तलास करतात तो तो जो फरारी झाला तो मी ही आठवण लिहिण्याच्या क्षणापर्यंत बेपत्ता!
****
आठवण १० वी
बुधवार ता. ३ मार्च १९४३
गव्हर्नर यजमान-पत्रपंडित वऱ्हाडी
गव्हर्नर व्हाइसरायादि गोरे महादेव हिंदुस्थानात येताच, लोककल्याणाचे कसले तरी थातुरमातुर ते बरोबर घेऊन येतात, असा आजवरचा पायंडा पडलेला आहे. लिनलिथगो महाराज आले ते पोळ- संवर्धनाचे चेटूक घेऊन आले. देशांतले सगळे पोळ त्यांची वहावा करू लागले. पुढे हे पोळ प्रकरण कोणत्या थराला गेले, ते लिनलिथगो साहेबांच्या भोवतालच्या पोळ-पलटणीवरून दिसतच आहे.
सन १९०४-०५ साल ते असावे. स्वदेशी चळवळ जोरात चालू झाली होती. सर्व इलाखाभर प्लेगाचा सर्वभक्षक धुमाकूळहि तितक्याच धडाक्याने सुरू होता. मुंबईची हापकिन इन्स्टिटयूट प्लेगच्या लशीने प्रयोग करण्यात रात्रंदिवस मग्न होती. सुरुवातीला गावोगाव लस टोचण्याचे जे प्रयोग झाले, ते फारसे यशस्वी झाले नाहीत. लस टोचून घेऊन मरण्यापेक्षा प्रत्यक्ष प्लेगने मरणे बरे असे विकल्प लोकात उठले. सरकारकडून लस सुधारण्याचे यत्न अभिनंदनीय धडाक्याने होत होते. पण एकदा लोकमतच बिघडल्यावर, नुसत्या धाकदपटशांने अथवा कायद्याच्या दंडुक्याने लशीचा प्रसार करणे ठीक दिसत नव्हते.
सर जॉर्ज क्लार्कनी पत्रपंडितांचे एक समेलन भरविण्याची योजना काढली आणि इलाख्यांतल्या एकूणेक छोट्यामोठ्या एडिटराना निमंत्रणे रवाना केली जाता येता डबल फर्स्ट क्लास आणि रोज ३ ते ५ रुपये अलोन्स देण्याचे ठरविले, संमेलनाला मी येणार, असे पत्र येताच प्रवासाचे नि अलौन्सचे रुपये भडाभड गावोगाव रवाना होऊ लागले. ज्यानी बापजन्मात कधि मुंबई पाहिली नव्हती व पाहण्याचा योगहि नव्हता, असल्या एडिटराना तर ही महापर्वणीच आली. त्यानी ताबडतोब मुंबईच्या सफरीसाठी जामानिम्याची तयारी केली. डबल फर्स्ट क्लास नि शिवाय भत्ता मग काय विचारता? ममई बघून शिवाय दोनचार रुपये खिशात पडायचा योग. कारण फर्स्ट क्लासातून प्रवास करणार कोण? बाहेरगावच्या कित्येक एडिटरांचे चेहरे मोहोरे तर इतके विदुषकी दिसत होते की त्याना फर्स्ट क्लासातून प्रवास करताना पाहून, तिकीट कलेक्टर महाशयानी तिकिटासह खाली उतरायला कमी केले नसते.
संमेलनाची तारीख दोन दिवसावर येताच, भाऊचा धक्का, बोरीबंदर आणि कुलाबा स्टेशनांवर कावयवावया अनोळखी एडिटर महाशयांच्या पलटणी उतरू लागल्या. हॉटेलवाल्यानी कित्येकाना घेरून दामदुप्पट दरात त्यांनी सर्व व्यवस्था `चोख` लावण्याचा विमा घेतला. कित्येक इष्टमित्रांकडे शोध करीत कीरत गेले. काही सरदारगृहात प्रवेशले. रेकलेवाल्यांची नि विक्टोरियावाल्यांची चंगळ उडाली. नवखे एडिटर `ममई` पहायला बाहेर पडले. स्थानिक एडिटराना मात्र दक्षणा नव्हती. त्याना रेकला किंवा विक्टोरियाचे फक्त भाडेच मिळायचे होते आणि तेसुद्धा मागाहून संमेलनांत हजेरी लावल्यावर. मला वाटते ते तसे कोणीच मागितले नाही.
मी या वेळी दोन चार पत्रांत अधूनमधून लिहीत असे. पण एडिटरकीचा शिक्का मिळालेला नव्हता. संमेलनाला तर आपण जायचे, हा माझा निश्चय. पोरसवदा त्या वेळी मी मिसरूटहि नव्हते फुटलेले. पण ओळखी फार. इंदुप्रकाशात मी लिहीत असे. पण त्याने तीनहि एडिटर संमेलनाला जाणार. मला पास शिल्लक नाही. अखेर ठाण्याच्या "जगत्समाचार" पत्राचे संपादक कै. वासुदेव गणेश ऊर्फ आबासाहेब देशपांडे यानी मला `असिस्टंट एडिटर जगत्समाचार म्हणून बरोबर न्यायचे ठरविले. कारण त्या वेळी अग्रस्फुटादि सर्व लेख पनवेलीहून पाठवून मीच ते साप्ताहिक पत्र भरून काढीत असे.
अखेर तो संमेलनाचा दिवस उजाडला. संध्याकाळी चार वाजता परळला हाफकिन इन्स्टिटयूटमध्ये संमेलन भरणार होते. पोर्चला जोडूनच एक मोठा शामियाना उभारला होता. उच्चासनावर गव्हर्नर साहेबांची खुर्ची टेबल मांडले होते. संपादकांसाठी गादीच्या खुर्च्या वर्तुळाकार मांडल्या होत्या. सकाळी १० च्या सुमारास मी एकटाच जाऊन ही व्यवस्था पाहून आलो. कारण, तेथे माझे एक शाळासोबती गावकरी मित्र केशव गणेश ऊर्फ `दादुमिया` गुप्ते क्लार्क म्हणून नोकरीला होता. तो आमचा वशिला ३ वाजल्यापासून किंवा आधीच बाहेरगावचे एडिटर, कोणी रेकल्यातून, तर कोणी पायी, जागेचा शोध घेत घेत येऊ लागले. त्यावेळी पोयबावडीच्या नाक्यावर सध्याचे वाडिया हॉस्पिटल वगैरे काही नव्हते. रस्ता जवळजवळ उजाड नाक्यावर एका पारशाचा मोठा प्रशस्त बंगला आणि विस्तीर्ण सुंदर बगिचा होता. हॉपकिनकडे जाणाराला हे बगिच्याचे नाके टाळता येत नसे.
२ वाजताच मी त्या बगिच्याच्या दारावर ठाणा मांडले. माझ्याबरोबर एरंडोलच्या देशकाल वर्तमान` या शिळाछापी साप्ताहिकाचे एडिटर होते. हे ज्योतिषी होते आणि यांचा जामानिमा पेशवाई थाटाचा नि डौलदार होता. येतील त्या एडिटरला `या बसा इथे. सभेला पुष्कळ अवकाश आहे` असे सांगून मी त्या बगिच्याच्या आवारात थोपवून ठेवू लागलो. आला एडिटर का बसव त्याला ओट्यावर, असा तडाखा चालू केला. अशी दहा-पंधरा मंडळी जमल्यावर, जो येई तो आमच्यातच सामील होऊ लागला. आप्पाशास्त्री राशिवडेकर तुळतुळीत गोट्यावर लालभडक जरीचे पागोटे, रेशमी उपरणे, पेशवाई बंदांचा आंगरखा घालून आले. त्यानाहि तेथे बसवले. थोड्या वेळात मी त्या सगळ्या एडिटरांचा एक मुजावरच बनलो. एकमेकांचा परिचय चालू झाला. गप्पा सुरू झाल्या. ते एक लहानसे संपादक संमेलनच बनले त्या बगिच्यात. दीडदोनशे एडिटर जमा झाले. गुजराथी एडिटर परस्परा जाऊ लागले. त्याना मारली थाप का `ठरावीक वेळेच्यापूर्वी तिकडे कोणाला जाऊ देत नाहीत. हत्यारी पोलिस उभे आहेत.` ते बेटे टरकले आणि आमच्यात सामील झाले.
इतक्यात टिळक, परांजपे, ठाण्याचे फडके बंधू वगैरे कंपू आला. तेहि जमलेल्या मंडळीकडे वळले. `काय, सभा इथे आहे की काय?` टिळकानी विचारले. पुढे होऊन भी म्हणालो "सभास्थान जवळच आहे. पण आधी जाऊन काय करायचे? नेमक्या वेळेला गेलेले बरे. शिवाय अझून गव्हर्नराची गाडी जायची आहे. ती इथून गेल्यावर आपण निघू सगळे. आपण आधी गेलो तर गव्हर्नरचे स्वागत आपल्याला करावे लागले. तोच आधी गेला नि आपण जमावाने मागाहून गेलो, तर त्याला आपले स्वागत करणेच भाग पडेल."
टिळकाना कल्पना पसंत पडली. एका बांधावर बसून त्यानी पगडी काढली नि घाम निपटला. चाराला असून अर्धातास होता. टिळकांनी उपरणे काढून कंबरखुंट बाधला आणि सगळ्या एडिटरांचा परिचय विधी आरंभला. फार मोठा मजा आला. हास्यविनोद कोट्या मनमोकळेपणाने करताना टिळकाना मी याच वेळी पाहिले. मंगरूळचे एक मुसलमान एडिटर आले होते. ते `विचारी` नावाचे एक मासिक काढत असत. छपाई हॅण्डप्रेसची गचाळ नि दरिद्री प्रत पाहून टिळक म्हणाले "वा, असली छपाई आमच्या पुण्याला सुद्धा होत नाही. दर महिन्याला दीडशे प्रति छापणं काही थट्टेचे काम नाही.`
इतक्यात गव्हर्नरांची गाडी लवाजम्यानिशी दुरून गेलेली दिसली. टिळक म्हणाले, `चला आता` मी म्हटले “चलायचे तर जरा लष्करी थाटाने, म्हणजे चाराचारांची रांग धरून जाऊ या." टिळकानी संमति देताच सर्व जमाव तसाच चालू लागला.
इकडे इंस्टिट्यूटमध्ये मजा उडाली. चाराला पाच मिनिटे, पण एकही एडिटर दिसेना! गव्हर्नर गोरेमोरे झाले. आपण येताच एडिटरांच्या टोळक्याकडून आपले भरगच्च स्वागत होईल, ही सर जॉर्ज महाशयांची कल्पना फोल झाली. ते इकडे तिकडे चौकशी करीत पहात आहेत तोच आम्हा पत्रपंडितांचे वऱ्हाड शिस्तीच्या रांगेने येताना दिसले आणि दरवाजाजवळ येताच, खुद्द गव्हर्नरने सामोरे येऊन टिळकांशी हस्तांदोलन केले. बाकीच्यांना सलाम केले. सर्व स्थानापन्न झाल्यावर, गव्हर्नरांनी स्वागताचे भाषण करून, प्लेगची लस कशी तयार करतात याचे प्रयोग पहाण्यासाठी दहा-दहा एडिटरानी पाचपाच मिनिटांच्या अंतराने लेबोरेटरीच्या अनेक दालनात क्रमाने जावे, अशी विनंती केली. प्रत्येक दालनात एकेक कृति मोठमोठे डॉक्टर समजाऊन देत होते. अशी नऊ दहा तरी दालने असावी.
सुमारे एक तासानंतर सगळी वन्हाडी आपापल्या जागी येऊन बसल्यावर गव्हर्नराचे आणखी खुलाशाचे भाषण झाले. सुधारलेल्या नि शेकडा ९५ टक्के यशवंत ठरलेल्या प्लेगच्या लशीची संपादकानी जनतेला जोराची शिफारस करावी, अशी त्यानी विनंती केली. भाषण चालले असतानाच, सभेच्या ठिकाणी लस टोचण्याचे साहित्य, दोन नर्सीस आणि दोन तीन डॉक्टर अस्तन्या सरसाऊन उभे राहिले होते. `लशीवर प्रयोगाची सर्व खाती प्रत्यक्ष पाहिल्यावर, ज्या एडिटर महाशयांचा या लशीवर आता विश्वास बसला असेल, त्यानी आता टोचून घ्यावे, अशी सर जॉर्ज यानी हास्य विनोद मिश्रित मुद्रेने विनंती केली आणि स्वतः टोचऊन घेतले. लगेच काळबादेवी रोडवरचे डॉ. चांदलिया आपल्या शर्टाची अस्तनी वर करून पुढे आहे. “आयाम एडिटर ऑफ गुजराथी केसरी" असे म्हणताहेत तोच लस टोचली गेली. आणखी दोनचार गुजराथी पारशी संपादकांनी टोचून घेतले. मग कोणी पुढे येई ना. काहीजणानी गव्हर्नरपुढे आपली व्याख्यानबाजी गाजवून घेतली.
पण मुंबई इलाख्यांतल्या पत्रपंडितांचे म्होरक्ये, वेस्टर्न इंडिया जनतेच्या मतांचे संचालक जो टिळक कंपू नि टिळक ते मात्र सारी मजा मुकाट्याने पहात बसले होते. अखेर स्वता उठून सर जॉर्जनी टिळकाना आपले मत सांगण्याची विनंती केली. आग्रह झाल्यावर टिळक अस्खलित इंग्रेजीत पाच मिनिटे बोलले. त्यांनी सरकारचे अभिनंदन केले आणि लशीच्या प्रसाराचे आश्वासन दिले. जनहिताच्या हरएक बाबतीत सरकारने असाच पत्रपंडितांचा सल्ला विचारला तर राज्ययंत्राच्या अनेक कटकटी त्रासाशिवाय मिटतील, असा त्यानी इषारा दिला.
नंतर गव्हर्नराशी सर्व एडिटरांचा हस्तांदोलनपूर्वक परिचयविधी उरकल्यावर सगळ्याना गार्डनपार्टीची अल्पोपहारी मेजवानी झाली. टिळक परांजप्यानी फक्त लेमोनेड घेतले. बाकीच्यानी सर्व खाद्यपेयांचा फडशा उडवला. मीहि त्यात होतोच म्हणा, माझे मित्र पेणचे रामभाऊ मंडलीक है या संमेलनाला हजर होते आणि त्यांनी ठाकुरद्वारचा बुकसेलर भावे या तरुणाला `परदेशी साखरेच्या पक्वान्नावर कोणकोण ताव मारीत आहेत, त्यांची नावे जमा करायला मेजवानीच्या गर्दीत धाडले होते.
****
आठवण ११ वी
मंगळवार ता. ३० मार्च १९४३.
स्थितप्रज्ञ काशीनाथपंत छत्रे
छत्रे म्हणजे सर्कसवाले, या पलिकडे विष्णुपत किंवा काशीनाथपंत यांच्या चारित्र्याची नि स्थितप्रज्ञत्वाची बाहेरच्या जगाला फारच थोडी माहिती असेल. सिंह, वाघ, घोडी खेळवणारे काशीनाथपंत हे एक महायोगी होते. संसार करीत असतानाच त्यापासून अलिप्त होते आणि सुखदुक्खांच्या हर्ष पीडेपासून विमुक्त होते. नानारंगीढंगी व्यवहाराशी हासत खेळत टकरा देत असता, अंतरीचा ज्ञानदिवा अखंड तेवत ठेवणारे प्रबुद्ध संत होते. आंगावर रेशमी भरजरी कपडे आणि मस्तकावर झगमगीत जरीची टोपी नित्य घालणारे, पण अंतर्यामी संन्यस्थ वृत्ति सिंह वाघाना जरबेत ठेवणारी त्यांची कडवी कदरवाज नजर तेवढी सर्वाना दिसे. पण सर्कस संसाराच्या वैभवी श्रीमंतीप्रमाणेच त्यांच्या हृदयाची श्रीमंती पुष्कळांनी अनुभवली असली, तरी त्या हृदयाचा कडवा संन्याशी बाणा लोकाना अझून कळावयाचा आहे. कोणीतरी सांगावयाचा आहे. सध्या वृत्तपत्रांच्या लांबी रुंदीला कागदाच्या दुर्मिळतेने क्षय लागला आहे. सारांशात या गोष्टी नीट लिहिता येण्यासारख्या नाहीत. तथापि एक दोन गोष्टी `के स्तु` सध्येसारख्या सांगावयाचा प्रयत्न करतो.
१९०६-०७ साल असावे. स्वदेशहितचिंतक नाटक मंडळीची छावणी अमरावतीला होती मी कंपनीबरोबर होती. पाटणकर संगीत मंडळीचा मुक्कामहि तेथेच होता. इतक्यात छत्र्यांची सर्कसहि अमरावतीला आली. त्यांची एक शाखा जबलपुराला खेळ करीत होती. विष्णुपताच्या निधनानंतर काशीनाथपंतांच्या आश्रयाला रहिमतखा आल्यापासून, छावणीच्या ठिकाणी दररोज सकाळी ८ ते ११ पर्यंत खांसाहेबांच्या गंधर्व गायनाचा मुक्तद्वार जलसा काशिनाथपत नियमाने करीत असत. शेकडो गायनप्रेमी जन कंपनीच्या बिहाडी शिस्तीने जमायचे. खांसाहेब समाधीच्या तन्मयावस्थेत गात आहेत, समोर काशिनाथपंत `वा, वाहवा, खाशी उत्तेजन देत जेठा मारून बसले आहेत, सगळे लोक कानाच्या ओंजळी करून रहिमतखांचे गायनामृत निःशब्द वृत्तीने प्राशन करीत आहेत, असा तो वर्णनीय देखावा माझ्या स्मृतिफलकावर स्पष्ट कोरलेला आहे.
एके दिवशी हा गायनाचा रंग अगदी भरपूर उफाळून चालला असता कंपनीचे मॅनेजर बापट उद्विग्न चेहऱ्याने हातात कसलीतरी गुलाबी रंगाची चिठ्ठी घेवून, काशिनाथपंतांचे लक्ष वेधण्याच्या हेतूने, आत बाहेर ये जा करताना दिसले. काशिनाथपंत तर खांसाहेबांच्या गाण्यात बेगुमान दंग! इकडे तिकडे कोणीकडेच पाहात ना. बापटांची वृत्ति क्षणोक्षणी चिंतातूर होत होती अखेर कोणीतरी बापटाना भेटायचे आहे वाटते आपल्याला` असे हळूच काशिनाथपंताना सुचविले. त्यानी बापटाना `काय आहे` म्हणून विचारताच त्यांनी हातात तार दिली.
“एकाएकी आग लागून सर्कसीचा तंबू जळून खाक झाला. माणसे जनावरे मात्र सुखरूप आहेत"
अशी ती जबलपूरची तार होती, वृत्ति यत्किंचितहि चळू न देता, काशिनाथपंत हासत हासत म्हणाले, "यात चिंतातूर होण्याइतके काय आहे? आपली माणसे जनावरे परमेश्वरांच्या कृपेने सुखरूप आहेत पब्लिकलाहि काही दगा फटका झाला नाही. तंबू जळाला, जळणारीच वस्तू असते ती! ताबडतोब नवा करवून घ्या, जबलपुरला तंबू फार छान होतात. वाचले नव्हते का हे मराठी दुसऱ्या पुस्तकात तुम्ही? चला कामाला लागा. हा चलने देव अभि खांसाहेब.
एकदम काशीनाथपंत गायनाच्या रंगात समरस मिसळले. जणू काय कुठे काही घडलेच नाही, पुढे दोन तास जलसा भररंग रंगला. सगळे श्रोते काशीनाथपंतांच्या वा विदेही नि स्थितप्रज्ञ वृत्तीचे आश्चर्य करीत घरोघर गेले. मी तर नेहमी ही आठवण मनाशी गुणगुणत असतो आज ती जाहीर सांगत आहे.
काशीनाथपंतांच्या दातृत्वाला सीमा नसे. कोणाला काय घेऊन जा म्हणून सांगतील, त्याचा नेम नाही. वाचकांची त्यांच्या छावणीवर नेहमीच झुंबड असायची. शक्य तोवर बापट वगैरे मंडळी त्याना परस्पराच काहीतरी देऊन बाहेरच्या बाहेर रवाना करायचे. पण काही मोठे खप्पी असायचे. ते थेट काशिनाथपंतानाच गाठायचे. एकदा एक भटजी सकाळीच काशिनाथपंताकडे आला. रात्रीच्या सर्कसच्या खेळाच्या उत्पन्नाचा हिशेब बापट तिकीटमास्तराकडून घेत होते. जवळच एकेक हजार रुपयांच्या नाण्यांच्या चार थैल्या ठेवलेल्या होत्या. शेजारीच काशिनाथपंत भेटीला आलेल्या काही गृहस्थाशी बोलत बसले होते. इतक्यात हे भटजी आले. त्यानी तोंडभर काशिनाथपंतांची स्तुति केली.
काशी- अहो भटजी महाराज, "स्तुती करावी परमेश्वराची करू नये व्यर्थ कधी नराची स्तुतीस की ईश्वर पात्र होतो, तसा तिला मानव काय होतो?" काय पाहिजे तुम्हाला, तेवढे सांगा.
भटजी- एकुलती एक मुलगी आहे. वय झाले. तिचा विवाह करायचा आहे. म्हणून आपल्या चरणाशी आलो.
काशी- माझ्या का गळ्यात बांधणार आहात तुमची मुलगी? महाराज माफ करा. या फकिराला असा पेचात पाडू नका.
भटजी- छे छे छे. मुलीच्या विवाहासाठी थोडे द्रव्य आपण द्यावे. एवढीच या गरिबाची मागणी आहे.
काशी- द्रव्य ना? हात्तेच्या! या इथे पडल्या आहेत चार थैल्या, न्या त्या उचलून तुमच्याच आहेत त्या उचला.
बापटांचा चेहरा गोरामोरा झाला, पंतानी उचला म्हणताच त्या भटाने थैल्या उचलल्या, तर त्याला खबरदार म्हणून म्हणायची पंचाईत. कारण असले प्रकार काशिनाथपतानी पुष्कळ वेळा केलेले त्याना माहित होते. पण तो भटजी कसला कर्मदरिद्री! तो घाबरला. पंत आपली थट्टा करताहेत असे त्याला वाटले, तो हात जोडून म्हणाला-छे छे महाराज, एवढे रुपये मला काय करायचे आहेत? चटकन काशिनाथपंत बापटाकडे वळून म्हणाले, "बापट, द्या या भटजीना दोन रुपये आणि करा थाना रवाना."
भटजी रुपये घेऊन बाहेर पडल्यावर, तेथला एक इसम त्याला म्हणाला, "दरिद्री आहेस लेकाच्या भटा उचल म्हटल्यावर उचलतास तर चार हजार रुपये मिळते तुला. आमच्या साहेबांचे दान होते ते. शुद तोंडातून गेला का मागे नाही घ्यायचे कधी." ही गोष्ट अमरावतीच्या मुक्कामातच घडलेली आहे.
****
आठवण १२ वी
ता. ११ जुलै १९४३. रविवार,
कै. कृष्णराव गोरे यांची कलानिष्ठ नि कर्तव्यनिष्ठा.
"रंगभूमीवर मरण, हाच माझा मोक्ष."
-कृष्णराव गोरे.
सिनेमा उदीमाच्या क्षेत्रात आज हजारो श्रीपुरुष कलावंत आणि कलावंतिणी म्हणून मोठ्या इतमामाने दरमहा हजारो रुपयांची पैदास करीत आहेत. कित्येक कलावंतिणी नि कलावंत गव्हर्नर नि व्हाइसरॉयच्या पगाराच्या बरोबरीने पगार उकळीत आहेत. सिनेकलेला वाहिलेल्या शेकडो साप्ताहिक मासिकानी त्यांचे नानाविध भूमिकांचे आकर्षक फोटो छापून, स्वताच्या पृष्ठ-शृंगाराच्या जोडीने, त्या त्या कलावंत कलावंतिणीना एवढी जबरदस्त प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे की तेवढी कोणत्याहि राष्ट्रीय पुढाऱ्याला, जगदीशचंद्र बोससारख्या शास्त्रसंशोधकाला, दादाभाई नवरोजी किंवा रविंद्रनाथ टागोरानाहि कधि लाभली नाही. आंतर्राष्ट्रीय कीर्तीच्या सरोजिनी नायडू कवयित्रीपेक्षा, शांता आपटे, दुर्गा खोटे, नस्सिम प्रभृति सिनेनटींचा बोलबाला फार मोठा, खेड्यापाड्यांतल्या भिवबा पांडबापासून तो शहरांतल्या श्रीयुत श्रीमत्यांपर्यंत सिनेकलावंतांची माहिती सर्वांना अगदी तोंडपाठ. एकादी नटी ४८ तास घरातून फरारी झाली आणि एकाद्या नटाला सेटवर काम करता करता सहज शिंक आली तर सिनेपत्रांत काय भलताच हाहाकार उडतो. अल्लाबक्षांचा खून झाल्याचे प्रकरण फारतर दहा पंधरा दिवस गाजणार वाजणार! पण एकाद्या नटीने धंदा सोडल्याची थाप सहज हवेत भिरकावून दिली, तर सारी वृत्तपत्रे वर्षभर कोल्हेकुयी करीत बसतात. कलेवर कोसळलेल्या या वज्राघाताच्या वेदनानी रकानेच्या रकाने भरून काढतात. असले मोठे भलतेच महत्त्व सिनेक्षेत्रांतल्या कलावंत कलावंतिणीना आजकाल आलेले आहे. एवढे महत्व निं इतकी अपरंपरा प्रसिद्धी रानडे, टिळक, गोखले, मेथा, सुरेन्द्रनाथ प्रभृति राष्ट्रसेवकांच्या वाट्याला कधीच लाभलेली नव्हती, नट नट्यांच्या प्रतिमा देव देवतांसमान घरोघर पुजून त्या पूजन भजनांतच जीवनानंद मानणाऱ्या भगतगणांच्या हजारांशाने सुद्धा रानडे टिळकाचे भगत त्यांच्या हयातीत त्याना लाभले नाहीत.
कलेच्या उद्धाराने राष्ट्राचा उद्धार करायला सजलेल्या या सिने-देव-देवतांची कलानिष्ठा नि कर्तव्यनिष्ठा, त्यांच्या प्रसिद्धीच्या प्रमाणांतच विनमोल असावी, प्रापंचिकानी सुद्धा आत्मोद्धारासाठी त्या निष्ठेचा कित्ता गिरवाचा, असा स्तुतिपाठकांचा असलेला समज, त्यांचा शुद्ध भ्रम आहे डोंगर नेहमी दुरून साजिरे गोजिरेच दिसतात.हजारो रुपयाचा रोख तनखा हबकणाऱ्या कित्येक नट नि नट्या वेळेवर कामावर हजर रहाण्याच्या बाबतीत कसकसले धिंगाणे घालतात, कसकसल्या पोरकट सबबीवर बेलाशक गैरहजर रहातात किंवा हजर राहूनहि कामाचा बिघाडा करतात, हे
जावे प्रोड्यूसराच्या वंशा, तेव्हा कळे
९९ डिग्री टेम्परेचर कडाडल्यामुळे, आज मुख्य नटमहाराज येत नाहीत. दुसऱ्या कंपनीच्या सेटवर काल रात्री ११ वाजेपर्यंत काम केल्यामुळे, मुख्य तारकेला पाठोपाठ दोन शिका आल्या, म्हणून एक आठवडाभर विश्रांति घ्यायला डागदाराने त्या देवतेला बजावले आहे. मुख्य स्टार नि तिचा प्लॅनेट न आल्यामुळे, बाकीच्या नाणेखुर्द्याचा पगार आणि सेटिंगचे भाडे वगैरे बसले प्रोड्यूसराच्या बोडक्यावर असल्या या कलावंत कलावंतिणीची कलानिष्ठ कसल्या मासल्याच्या मसाल्यांची असते हे `कलेसाठी कला` सूत्राच्या पुरोगामी पंडितानाच ठावे! पण त्यांची कर्तव्यनिष्ठा हे काय जंतरमंतर नि गारुडी भारूड आहे, हैं सिने स्टूडियोशी थोडाफार संबंध येणाऱ्या कोणालाहि सहज समजण्यासारखे आहे.
मऱ्हाठी रंगभूमीच्या जुन्या जमान्यात शेकडो नामवंत नटनट्या चमकून गेल्या. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा इतिहास सामुग्र्याने आठवणीत आणला की त्याना धन्यवाद द्यावेसे वाटते. फाजील प्रसिद्धीशिवाय कर्तव्य बजाऊन दिवंगत झालेल्या त्या नटनटींची कलानिष्ठ त्यांच्या कर्तव्यनिष्ठे इतकीच प्रामाणिक नि चोख असे. याचा एक नमुना म्हणून माझे नट-रनेही क. कृष्णराव गोरे यांच्या दोनच आठवणी देतो.
स्वदेशहितचिंतक नाटक मंडळीचा मुक्काम नागपुरला होता. तात्यासाहेब कोल्हटकरांचे `मूकनायक` नाटक त्या वेळी फार लोकमान्य कृष्णरावांची विक्रांताची भूमिका पेटण्ट. शनिवारी खेळ लागला. आदल्या दिवशी कृष्णराव एकदम तापाने बेफाम आजारी पडले. ताप १०४ ते १०५ कायम. जनुभाऊ निवकर नि मॅनेजर म्हसकर चिंतेत पडले. शनिवार उजाडला. थेटरवर सकाळपासूनच रिझर्व तिकीटविक्री चालू झाली. राजाराम सोहोनीने विक्रांताचे काम करावे, अशी कुणकुण कृष्णरावांच्या कानी येताच, त्यानी तापाच्या अवसानातच ओरडून सागितले, "माझे काम मीच करणार." डॉक्टर वगैरे चिंतातूर झाले. याला डोळे उघडवत नाही. ताप सारखा कायम, जागचे हालायची पंचाईत नि हा स्टेजवर जाणार कसा नि पांच तास संगीत काम करणार कसा? कृष्णराव तर हट्टच धरून बसले. जनुभाऊनी नि म्हसकरांनी समजूत घालण्याचा खूप यत्न केला. पण व्यर्थ. अवसानात येऊन कृष्णराव म्हणाले -"माझी आई रंगभूमी, माझे गुरू आण्णासाहेब (किर्लोस्कर) नि भाऊराव त्यांच्या नावावर माझ्या कामांत आजवर कधि खंड पडला नाही. त्यांचे नांव घेणार नि मी रंगभूमीवर जाणार! काय होईल ते होईल. रंगभूमीवर काम करता मेलो, तर तोच माझा मोक्ष. माझी आई रंगभूमी समर्थ आहे."
दोघातिघांनी मेकअप केला. कपडे चढवले, दोनहि विंगांत एकेक कोच टेवला. डॉक्टर इंजेक्शने नि औषधे घेऊन सा. कृष्णरावाना कोचवर जेमतेम आणून बसवले, नुसता लोळागोळा होता तो! काय होते, कोण जाणे, ही सगळ्याना धुकचूक वेळ येताच "हं, कृष्णराव, चला उठा" अशी सूचना मिळताच, दोघातिघानी त्याना विंगपर्यन्त नेले. कृष्णरावने डोळे उघडले. फूटलाईट डोळे ताठ उघडून पाहिला. त्याला नि रंगभूमीला नमस्कार केला. आण्णासाहेब किर्लोस्करांचे नि भाऊरावाचे मोठ्याने स्मरण केले आणि तडाड अवसानात रंगभूमीवर आले. प्रवेश होताच टाळ्यांचा कडकडाट नि पेटीचे सूर चालू झाले. जणू काय कोठेच काही झाले नाही अशा नेहमीच्या सरावांत कृष्णरावाने "व्यक्तरदन वर्धुनि बदन" या पदाची ललकारी मारली नि प्रेक्षकाना गारीगार केले. संबंध नाटक त्या रात्री कृष्णरावाने भलतेच रंगवले. प्रवेश संपऊन आत येताच डॉक्टराने धरायचे, कोचावर निजवायचे, एकदा औषधाचा डोस द्यायचा, प्रवेशाची वेळ आली का रंगभूमीवर कृष्णराव अगदी तन्मयतेने काम करायचे, अशा रीतीने "मूकनायक" नाटक विनाविघ्न पार पडले. आश्चर्याची गोष्ट, दुसऱ्या दिवसापासून त्याना आराम पडत गेला. बुधवारच्या खेळाला स्वारी पुन्हा तयार
दुसरा प्रसंग तर मोठाच आणिबाणीचा! पण केव्हाहि कृष्णरावाची कर्तव्यनिष्टा लवमात्र चळली ढळली नाही. कंपनीचा मुक्काम अमरावती नजीक बेलोरा गावात होता. कृष्णरावाना एकच मुलगा होता. कंपनीत तो सगळ्यांचा लाडका. बापासारखा तो स्वरूपसुंदर होता. नवसासायासाचा एकुलता म्हणून आम्ही त्याला `कोण्डया` नावाने हाक मारीत असू. पंधरा दिवसापूर्वी कृष्णरावाने कुटुंबाला वाईला पाठविले होते. नाटकाच्या दिवशी सकाळीच कोण्ड्या एकाकी वारल्याची तार आली. कंपनीत हाहाकार उडाला. कोणी जेवलेसुद्धा नाही. बिचाऱ्या हतभागी बापाची अवस्था काय सांगावी समजावता समजावता सगळ्यांची त्रेधा उडाली रात्री कृष्णरावने काम करू नये, असे जनुभाऊने ठरवले. म्हसकरानी कृष्णरावांची खूप समजूत घातली. पण छे! वेळ होताच कृष्णराव रंगपटावर हजर. मेकअप वगैरे करून त्यानी त्या कठोर दुःखाच्या प्रसंगातहि आपले काम रोखठोक पार पाडले.
याला म्हणतात कलानिष्ठा नि कर्तव्यनिष्ठा! आजकालच्या कलावंत कलावंतिणीत ती किती आहे, हे ज्याने त्याने नि जिने तिने आपल्या मनालाच विचारावे.
****
आठवण १३ वी
मंगळवार ता. २ नवंबर १९४३
९४ सालचा काठेवाडी दुर्गादेवी दुष्काळ
आजकाल बंगालकडील भयंकर दुष्काळाच्या कहाण्यानी वृत्तपत्रांचे स्तंभ चिकार भरून जात आहेत. तेव्हा मी एकदा पाहिलेल्या महाराष्ट्रातल्या दुष्काळाची आठवण लोकाना सांगावी, असे बरेच दिवस ठरवीत होतो. पण ती लिहून काढायला मलाहि वेळाचा दुष्काळ! आज अगदी निश्चय करून बसलो आणि पाठवीत आहे लोकमान्याकडे प्रसिद्धीला त्याना जागेचा दुष्काळ असा दुष्काळी मामला सध्या भडकला आहे सगळीकडे!
सन १८९२ साली मुंबईत प्रथमच प्लेगोबाचे आगमन झाले आणि त्याने हजारो लोकांचे बळी घेतले. पाठेपाठ हिंदू मुसलमानांचा दंगा मुंबईला झाला आणि भिवंडीलाहि त्याचा प्रसाद मिळाला. आता मात्र कलियुग चालू झाले, असे लोक बोलू लागले. कोणी कोणी म्हातारे म्हणत की हा सारा प्रकार त्या पुण्याच्या टिळकांच्या धर्मभ्रष्टतेचा त्याने गणपतीसारखे घरातले पवित्र दैवत चव्हाट्यावर आणून मांडले. ती देवता कोपली. म्हणून हा प्लेग नि हे दंगे. तशात ९४ साल उजाडते न उजाडते तो काठेवाडला भयंकर दुष्काळ पडला. लोक पोरे विकू लागले, वगैरे आताच्यासारख्या भयंकर बातम्या येऊ लागल्या. त्यावेळी वर्तमानपत्रे फार थोडी असत. त्यातल्यात्यात "मुंबई वैभव" हे दैनिक बऱ्याच गांवी जात असे. त्यात हा दुष्काळाचा मजकूर मीठ मिरची लाऊन वर्णन केलेला असायचा.
त्यावेळी इकडे दक्षिणेत तसे म्हटले तर धनधान्याची आबादानी होती. रुपयाचे ८ अघोली तांदुळ आमच्या पनवेलला मिळायचे. दोन दिडक्यांच्या पिठीसाखरेत सबंध कुटुंबाचा दोन वेळचा चहा होऊन "बरसायला येणाऱ्या उमा रमाबाईच्या हातावर ठेवण्या इतकी साखर उरत असे (त्यावेळी भेटीला येणाऱ्या माणसाला चहाचे डोस देण्याचा प्रघात नसे.) अशा आबादानीत रहाणाऱ्या लोकाना काठेवाडी दुष्काळाच्या बातम्या प्रथमप्रथम कादंबरीसारख्या मनोरंजक वाटायच्या. आई-बाप मुलें विकतात अशी याचेच त्याना नवल वाटायचे. सारांश, दोन वेळा यथास्थित जेऊन ढेकर देणाऱ्या दक्षिण प्रांताच्या लोकाना काठेवाडी दुष्काळाच्या परिणामाची नीट कल्पनाच येई ना! माणुसकीच्या भावनेने एकादी उसाळी चुकून मारलीच तर `अरेरे! काय विचाऱ्यांची अवस्था असेल, हरि जाणे या पलिकडे फारसा कोणी विवळत नसे.
पण अखेर त्या काठेवाडी दुष्काळाने दक्खनलाहि चिमटा घेण्याचा बेत केला. ते दिवस चातुर्मासाचे होते. लोकांच्या अंगणांत नि परसांत निरनिराळे भाज्यांचे मंडप अगदी डरवलेले होते. पडवळी, कारली, शिराळी, घोसाळी, भोपळे वगैरे भाज्या दारातल्या दारात ज्याला त्याला हक्काच्या असायच्या, फक्त धान्यधन्य तेवढे बाजारातले नि तेहि मुबलक मिळायचे. त्याशिवाय का ७-८ नि १०-१२ रुपये पगाराच्या माणसानी दहा दहा बारावारा मंडळीची कुटुंबे मिशाना तूप लावून पोसली?
एके दिवशी सकाळी (आमच्या पनवेलीला) गावकरी लोक उठून पहातात तो आगणातले नि परसातले भाज्यांचे मंडप फडशा पडलेले! नुसत्या काठ्या नि काटक्या जाम्यावर! पाला भाजी फळे खलास! झाले काय? कोणालाच काही कळेना, डोळे चोळून आणखी पहातात तो जिकडे तिकडे गावात काठेवाडी दुष्काळी पुरुष बायका नि मुलांच्या झुण्डीची लेंढरे अन्नासाठी गयावया करीत फिरताना दिसली. सारा गावच त्यानी उफलून निघाला होता. या लोकांनी गावात आल्याबरोबर रात्रीच्या रात्री साऱ्या भाज्यानिपाले फळे खाऊन आपली तात्पुरती भूक भागवली होती. सारा गाव त्या काठेवाडी हेडीने (हा `हेड` शब्द त्याच वेळी मी ऐकला नि स्मृतिकोषांत कोरून ठेवला) अगदी दणाणून सोडला. मामलेदाराची धांदल उडाली. त्यावेळी पनवेलीला तारयंत्र नव्हते. झटपट बातमी पाठवण्याचे काहीच साधन नव्हते. सारा मामला कागदी रपोटावर स्पोट जाणार कधि नि मामलेदार साहेबांच्या `काय करू`ला `वरून` सल्ला येणार कधि? काठेवाडी बायका तर चारचार आण्याला पोरे विकायला निघाल्या. कित्येक तर स्वताला विकत घ्या म्हणून विनवीत होत्या. पण शाबास आमच्या पनवेलकरांची, (आणि हीच स्थिती सबंध कुलाबा नि ठाणे जिल्ह्यातहि होती) त्यानी ही मानव खरेदीची पापी क्रिया मुळीच केली नाही. सरकारकडून बंदोबस्त काय झाला? तर पोलिस टोळ्यांकडून त्या काठेवाडी हेडीला गावाबाहेर हुसकण्याचा अट्टहास!
विठोबा खंडाप्पा गुळव्यांचे जावई महादाप्पा शेट आठवणे (कै. आत्माराम शेट आठवणे यांचे वडील) व सुपुत्र कै. शंकरशेट गुळवे वगैरे खानदानी श्रीमंत मंडळीनी तात्काळ त्या सरकारी प्रतिबंधाला प्रतिबंध केला. दुष्काळ्याना गावाबाहेर छावणी करून दिली आणि शिजवलेले अन्न पुरवण्याची व्यवस्था केली. माझे मातुल आजोबा वामनराव जिवाजी पत्की यानी प्रथम झुणका भाकरीचा मोठा भटारखाना स्वताच्या खर्चाने काढून, गावातल्या इतर श्रीमंताना या जनसेवेचा मार्ग दाखवला. सुमारे पंधरा दिवस गावकऱ्यानी त्या दुष्काळी लोकांचे पालन पोषण केले. पुढे सरकारने त्या टोळ्यांना हद्दपार केले.
ठाणे आणि कुलाबा जिल्ह्यात गावोगाव काठेवाडी हेडीने स्वाऱ्या केल्यामुळे सर्वत्र एक निराळीच परिस्थिती निर्माण झाली. एक महिन्याच्या आतच चान्यांचे भाव कडाडले. तांदूळ महाग झाला, जवळ जवळ मिळेनासा झाला. कडदणाची तीच स्थिती. लोक भांबावले. आपलाहि काठेवाड दिसणार का काय, अशी ज्याला त्याला धुकधुक, अखेर प्रत्यक्ष दुष्काळ चालू झाला. पण तो काही काठेवाड सारखा अथवा आताच्या बंगालसारखा नव्हे. `रंगुन तांदूळ` हे नाव आम्ही त्याचवेळी प्रथम ऐकले. वाल गेले नि पावटे आले. कितीहि भिजत घाला. त्याला मोडच यायचा नाही. तांदुळ रुपयाला पाच अधोली होताच लोकांचे डोळे पांढरे झाले. त्या बेट्यांना काय कल्पना की आम्ही त्यांचे वंशज आज दोन नि अडीच रुपये पायलीचे तांदूळ (तेहि फक्त नावाचे) खात आहोत!
त्या काठेवाडी हेडीतल्या बायका नि पुरूष विक्रीसाठी पोरे कशी पुढे करीत, घरच्या ओट्यावर त्याना सोडून, दुरून चार आणे दोन आण्याची दीनवाणी याचना करीत, याची मला आठवण झाली म्हणजे बंगालच्या कहाण्या न वाचताहि मला अजमावता येतात.
****
आठवण १४ वी
शनिवार ता. १९ फेब्रुवारी १९९४
सर फिरोजशानी बेस्ट कंपनीवर बहिष्कार घातला
अपुऱ्या कोळशाचे रिकामे डबरे वाजऊन बॉम्बे गॅस कंपनीने थोड्या दिवसापूर्वी मुंबानगरीच्या तोंडाला जी काळोखी फासली होती आणि त्यामुळे कॉर्पोरेशनची जी कायदेबाज तारांबळ उडाली होती, ती पाहून मला ही जुनी आठवण आली.
पंचम जॉर्ज बादशहाचा राज्यारोहण समारंभ हिंदुस्थानात आणि मुख्यत्वे मुंबई शहरात फारच दणक्या ठणक्याचा झाला. रोषनायीच्या बाबतीत आधीच मुंबईचे नाव तमाम हिंदुस्थानात गाजले वाजलेले. तशात हा राज्यारोहण समारंभ अनेक वर्षानी आलेली महापर्वणी. बिजलीच्या प्रकाशाने सबंध मुंबई झगमगीत करायला लोक नि सरकार एकमेकांशी चुरशीच्या सामन्यात अगदी बेहोष दंग सगळ्या देशातून लाखो लोक `बम्बइकी रोषनाई देखनेके लिये गोचीड़गर्दी करून जमले.
पण कोठे काय माशी शिंकली कोण जाणे! बेस्ट बिजली कंपनी आणि मुंबई कार्पोरेशन (अर्थात सर फिरोजशहा मेथा) यांच्यात दराविषयी किंवा अशाच काही मुद्यावर मतभेद झाला. त्यावेळी घोड्यांच्या ट्रामा बंद झाल्या होत्या, तरी वेस्ट कंपनी अगदी घोड्यावर बसलेली होती. जेव्हा कंपनी आपलाच हेका धरून बसली. तेव्हा सर फिरोजशहानी कोणाच्याहि मताची पर्वा न करता, एकदम हुकूम काढले की म्युनिसिपालिटीच्या इमारतींची रोषनाई विजलीने न करता जुन्या खोबरेल तेलाच्या रंगबेरंगी ग्लासनी करावी. पुष्कळ मोठमोठ्या लोकानी मध्यस्थी केली. पण फिरोजशानी आपला हट्ट सोडला नाही.
"मी या कंत्राटी कंपन्यांची मिजास क्षणभरसुद्धा चालू देणार नाही. आज ते म्युनिसिपालिटीला अटी सुनावतात. उद्या जनतेला सुनावतील, असली मिजास गर्भातल्या गर्भातच ठेचून काढली पाहिजे." फिरोजशा म्हणाले.
सबंध कोर्टात सगळ्या सरकारी नि व्यापारी इमारतीवर बिजलीची रोषनाई लखलखाट करू लागली. पण मुंबई म्युनिसिपालिटीच्या इमारतीवर? बांबूंच्या परांच्या बांधून निरनिराळ्या रंगाच्या खोबरेल तेलाच्या ग्लासांतून दिव्याची रोषनाई लागली. शेजारीच बोरीबंदरचा जी. आय. पी. चा बिजलीचा थाट आणि जवळच हा खोबरेली ग्लासांचा जुना नाना शंकरशेटी थाट पाहून पुष्कळाना चमत्कारिक वाटले. तरी त्यात फिरोजशा मेथांचा स्वाभिमानी बाणा सगळ्यांना बिनचूक पटल्यामुळे, मुंबईकरांनी आणि बाहेरगावच्या लाखो बध्यानी चकार शब्द काढला नाही. उलट त्यात बेट कंपनीचीच नाचक्की झाली. मधून मधून वारा यायचा नि एका बाजूची ग्लासे विझून जायची. त्यासाठी सारखी शेकडो मंडळी कामावर ठेवली होती ती भराभर परांच्यावर चढून विझलेले दिवे काकड्यानी लावायची, असे सारखे तीन दिवस रोषनाईचे पार पडले. पण फिरोजज्ञानी बेस्ट कंपनीपुढे लवमात्र मान वाकवली नाही.
मुंबईच्या गॅस कंपनीने कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्याच्या सबबीवर दिवेबंदीचे जे धोरण पत्करले होते, त्याला, सर फिरोजशा हयात असते तर काय खरमरीत उत्तर मिळाले असते, याचा वाचकांना तेव्हाच अंदाज लागेल. फिरोजशा मवाळ कंपूतले, असा त्या वेळी प्रवाद होता. पण त्या मवाळाग्रणीच्या असल्या काही तडफदार कृत्यांची आठवण झाली आणि चालू जमान्यांतल्या लवंगी मिरचीवजा जहालांची वर्तने पाहिली, म्हणजे मवाळ कोणाला म्हणावे नि खरे जहाल कोण, हे ठरवणे जरा पंचायतीचेच होते.
****
आठवण १५ वी
शुक्रवार ता. १७ ऑगस्ट १९४४
जातिभेदाला पहिली थप्पड
एका दक्षिणी स्त्रीचे नैतिक धैर्य
जुन्या मुंबईत चहावे हॉटेल आणि पाव बिस्कुटाची बेकरी हे दोन धंदे प्रामुख्याने भण्डारी लोकांच्या हातांत होते. सबंध मुंबईला ब्रेड पाव लिमजी बिस्किटे या भण्डारी बेकऱ्याच पुरवीत असत आणि गोया लोकांच्या खाणावळीतहि त्या ब्रेड पावांची लज्जत वाखाणली जात असे. काही भण्डारी हॉटेलात चहाशिवाय मांसाहाराची फार चोखट सोय असे आणि अशी तीन चार जुन्यांतली जुनी भण्डारी हॉटेले कोटांत नि गिरगावांत अजून चालू आहेत. भण्डारी हॉटेलातच चहा मिळत असल्यामुळे, बामणांची पंचाईत व्हायची. गिरगावात एक दोन बामणांची छुपी हॉटेले गल्लीकुचीत असायची. तेथे गुपचूप जाऊन कित्येक बामण चहाची तलफ चोरून भागवीत असत. कारण, त्याकाळी हॉटेलांत उघडपणे चहा पिणे अथवा काही खाणे प्रशस्त मानले जात नसे. चार पाच मंडळीनी कुडाच्या पडद्याआड गुपचुप बसून खावे प्यावे नि पसार व्हावे. दारूच्या गुत्यांत शिरणारांकडे लोक जितक्या कुत्सित काण्या नजरेने पहात नि धिक्कार दर्शवीत. त्याच नजरेने लोक हॉटेलगामी प्राण्यांकडे पहात असत. मात्र या बामणी छुप्या हटिलात बामणांचाच प्रवेश व्हायचा. इतरांना तेथे मज्जाव असायचा.
पहिल्यापासूनच मुंबई शहर म्हणजे नोकरमान्यांचे माहेरघर. बाहेरगावांहून नोकऱ्यानिमित्त तरुणांच्या टोळ्याच्या टोळ्या नित्य येथे यायच्या, बिऱ्हाडाची (म्हणजे चंबूगवाले ठेवण्याची सोय एकाद्या ओळखीच्या किंवा नातेवाइकाच्या ओसरीवर झाली, तरी मम्मंची व्याद तो किती दिवस भागवणार? अर्थात, सार्वजनिक खाणावळीची आवश्यकता पुढे आली. या दिशेने पहिला धाडसाचा यत्न भटवाडीतल्या सखूबाईने केला. विधवा बाईने असा एकदा स्वतंत्र धंदा अगर व्यवसाय करणे, ही कल्पनाच त्या काळी मोठी बण्डखोर! शहाण्यासुरत्यांच्या भावना एकदम जखमी व्हायच्या पण सखुबाईने सर्व सामाजिक विकल्पाना झुगारून खानावळीचा धंदा सुरू केला, मुंबईच्या हिंदू खानावळींच्या इतिहासात या सखुबाईचे नाव अग्रगण्य आहे.
सखूबाईने खानावळ उघडताच, पहिला मोठा पेचप्रसंगाचा प्रश्न आला, तो म्हणजे आमच्या नाठाळ जातीभेदाचा खाणावळींत बामण येणार तसे इतर आठरापगड बामणेतरसुद्धा येणार. या सगळ्यांच्या निरनिराळ्या जातवार पंगति मांडायच्या तर मलबार हिलचे आंगणसुद्धा पुरायचे नाही. आणि बामणेतरांच्या पंगतीला बामणे जीव गेला तरी बसायची नाहीत. या पेचावर सखुबाईने दणदणीत तोंड काढली. तिने प्रत्येक अन्नार्थी बुभुक्षिताला स्पष्ट बजावले. "माझी खानावळ अन्नार्थ्यांसाठी आहे. मी बामण ओळखीत नाही नि जातपात मानीत नाही. प्रत्येक हिंदूला मी एका पंगतीला सारखे वाढणार- अगदी पाटाला पाट नि ताटाला ताट भिडवून वाढणार. जरूर असेल त्यांनी यावे, नसेल त्याने खुशाल भुके मरावे. मला त्याची पर्वा नाही. कोणी कुरबुर टुरटूर करील, त्याला भरल्या ताटावरून ओढून उठवून हाकलून देईन."
झाले. कर्दनकाळ सखूबाईचा हा दण्डक जाहीर होताच, यच्चावत बामणे नि बामणेतर खाणावळीत पाटाला पाट भिडवून गुण्यागोविंदाने जेऊ लागले. सकाळ संध्याकाळ हजार पांचशे पाने उठू लागली. हाताच्या बोटांवर मोजण्याइतके काही कर्मठ ब्राह्मण, सखूबाईच्या खास मेहरबानीने, मुकटे नेसून एकालहानशा अंधाऱ्या खोलीत सोवळ्याने जेवत असत. त्या खोलीत सखूबाई `विटाळशीची खोली` असे म्हणत. मोठ्या पंगतीत वाढणी चालत असली म्हणजे सहाजीकच या सोवळ्या बामणांकडे वाढण्यांचे दुर्लक्ष्य व्हायचे. "अहो, आमटी आणा, चपाती आणा, हे आणा, ते आणा." असा ते ओरडा करायचे. बराच ओरडा झाला की सखूबाई गरजायची, `अरे, बण्डया, त्या विटाळशा बाया काय बोंबलताहेत तिकडे पहा.` त्या सोवळ्या जेवणारानी तक्रार केली, तर बाई स्पष्ट सांगायची, "हे पहा, मोठ्यापंगतीचे काम टाकून तुमच्याकडे `पेशल` पहाणार कोण? तुम्हाला सगळे `पेशल` पाहिजे तर ते मला जमणार नाही. वाढण्याच्या सोयीसोयीनेच घेतले पाहिजे तुम्हाला. चांगले मोठ्या जमातीत बसून गुण्यागोविंदाने खावे, गप्पागोष्टी सांगाव्या, ते बसता कशाला त्या अंधाऱ्या खोलकंटात सुतक्यासारखे?"
सखूबाईचे उदाहरण पाहून मागाहून गिरगावांत आणखी तीन चार ब्राम्हण विघवानी खाणावळीचा उपक्रम केला आणि तो अगदी सखुबाईच्या शिस्तीने चालवला. झावबाच्या वाडीतली भीमाबाई आणि मुगमाटातली चंद्रभागाबाई यांच्या खाणावळी सारख्या जोरात चालत असत. दरमहा रुपये सात आणि साडेसात, असे दोनच भाव असत सातवाल्याना ताक आणि साडेसातवाल्याना दूध दही, एवढाच फरक. बाकी सगळी व्यवस्था सारखी. त्यात प्रपंच नाही. रविवारी काहीतरी `पेशल` बेत असायचा आणि तो मंडळीना विचारून ठरायचा. सणावारी मिष्टान्न भोजनाच्यावेळी कोणी कमी जेवले तर बाई उस्तळायची. कायरे, आधी कुठे हाटेलात शेण खाऊन आला होतास वाटतं?" असा भरमंडळीत टोमणा द्यायची. प्रत्येक आसामीला दरमहा चार पाहुणे फुकट, मग ते `पेशल` बेताला अथवा सणावारी आणले तरी तक्रार नाही. एकादा इसम दोनतीन वेळा आला नाही, तर सखूबाई लगेच त्याच्या बिन्हाडी आपला माणूस पाठवून चौकशी करायची आणि तो आजारी असला तर तो बरा होऊन जेवायला परत येईपर्यंत दोन्ही वेळेला साबूदाण्याची पेज बिनचुक घरपोच पाठवावयाची. हा प्रघात बाकीच्या सर्व खानावळीहि पाळीत असत.
सखूबाईच्या तोंडाला फारसे कोणी तोंड देत नसत. देईल त्याचे असे काही वाभाडे काढायची ती, का सगळ्या पंगतीची भरमसाट करमणूक! तिचा तोंडपट्टा चालला असता मधेच कोणी काही बोलला तर एक पेटंट वाक्य असायचे. `चूप, मधेच मला `एंटरप्रेट` करू नकोस. अरे, एवढा मोठा तो जस्टिस रानडा नि तो चंद्रावर माझ्या खानावळीत जेवले म्हणून हायकोडताचे जडज झाले, समजलास एकादाचे दोन महिन्याचे बिल थकले आणि तो लाजेकाजेसाठी खाणावळीत येण्याचे टाळू लागला, तर बाई त्याला मुद्दाम बोलावून आणायची आणि हात धरून जेवायला घालायची. मग सगळ्या पंगतीत त्याची कानउघाडणी करायची, `अरे मुंबईची नोकरी म्हणजे आळवावरचं पाणी. आज गेली तर उद्या मिळेल दुसरी. पण मेल्या, उपाशी राहून तू काय करणार? उपाशी पोटाने नोकऱ्या मिळत नाहीत. तुझा हात चालेल तेव्हा दे पैसे. पण जेवायला टाळाटाळ करशील तर ओतीन भाताचे आधण तुझ्या बोडक्यावर पंगती चालल्या असताना, कमरेवर हात देऊन बाई पंगतीतून शतपावल्या घालायची. प्रत्येकावर काही ना काही टीका, टिप्पणी, टिंगल सारखी चालायची. सणावारी तर पोटभर जेवण्यावर तिचा फार मोटा कटाक्ष. मधून मधून एका रांगेने चारपाच बामणे सारखे बसलेले पाहिले का मग सोवळ्यावर सखुबाईचे टिंगल पुराण असे काही बेफाम चालायचे का पुढच्या खेपेला ते सारे बामण पंगत मोडून सरमिसळ बसायचे.
तात्पर्य, सहभोजनाने जातीभेदाचे बंध तुटले नाहीत तरी किंचित ढिले पाडण्याची कामगिरी आजकालच्या समाज सुधारकांच्या कल्पनेत फुरफुरण्यापूर्वीच सखूबईने हा धाडसी प्रयोग केलेला आहे आणि त्याचे महत्व हिंदूंच्या सामाजीक सुधारणेच्या इतिहासात डावलता येणार नाही.
****
आठवण १६ वी
गुरुवार ता. १५ फेब्रुवारी १९४५
सुप्रसिद्ध गवई रहिमतखां मुंबईत बेपत्ता
मुंबई नि साष्टी पोलीसांची धावपळ
शनिवारची सकाळ, खेतवाडीतल्या एका ग्रेण्टिनेड स्कूलमध्ये मी मास्तरकी करायला चाललो होतो. साल १९०१-०२ असावे. महिना आठवत नाही. कांदेवाडीतल्या सदाशिव स्ट्रीटमधून शाळेला जाण्याचा माझा रोजचा रस्ता. स्ट्रीटमध्ये मी शिरतो तोच "पळा पळ, सांभाळा घोडा उधळला" अशा आरोळ्या एकू आल्या. लोक भराभर सैरावैरा धाऊ लागले. पहातो तो एक व्हिक्टोरियाचा घोडा चौखूर उधळत बेफाम सुटलेला. घाबरून मी चटकन सदाशिव स्ट्रीटमधल्या एका बंगल्याच्या आवारात घुसलो. घोड्यांच्या टापांचा सैतानी खडखडाट आणि लोकांच्या आरोळ्या जोरात चाललेल्या त्या बंगल्यातून एक मध्यम वयस्क, गोरापान, राजबिंडा पुरूष बाहेर आला नि "काय झाले हो" असे त्याने मला विचारले. "व्हिक्टोरियाचा घोडा उधळला आहे" असे मी त्याला सांगत आहे, तोंच तो गृहस्थ आवेशाने बाहेर पडला.
घोड़ा सदाशिव स्ट्रीटच्या वळणावर वळत आहे. लोक धूम धापा टाकीत पळत आहेत, तोच तो इसम धिटाईने त्या उधळलेल्या घोड्याच्या थेट आंगावर गेला आणि डोळ्याची पापणी लवली असेल नसेल इतक्यात त्याने त्याची तुटकी लगाम पकडून, झटकन दोन कान जोराने दाबून मिटून धरले. घोडा चटकन थंडावला. खाडकन त्या इसमाने त्याच्या कानशिलावर एक चपराक लगावली. महिरी आल्यासारखे घोड्याने डोके हालवले नि तो निश्चळ उभा राहिला. इतक्यात गाडीवान धावत आला. घोड्याजवळ जायला तो भेदरू लागला. तो इसम त्याला म्हणाला, "अरे आता कशाला भितोस. पकड लगाम नि जा त्याला घेऊन. आता हा भडकणारच नाही. शेळीसारखा येईल तुझ्याबरोबर." आणि खरोखरच तसे झाले.
हे गृहस्थ म्हणजे प्रख्यात सर्कसवाले विष्णुपंत छत्रे, सदाशिव स्ट्रीटवरील सुप्रसिद्ध आयुर्वेदीय कारखानदार गोपिनाथ कृष्णाजी क्षत्रिय यांच्या बंगल्यात त्यांचा मुक्काम होता. विष्णुपंत मुंबईला आले का नेहमी त्यांचा मुक्काम येथेच असे. मी याच बंगल्याच्या आवारात लपलो होतो. रोज शाळेत जाता येता या बंगल्यात गाण्याच्या तनाऱ्या कां ऐकू येत असत, याचे गूढ मला याच वेळी उकलले. ओटीवरच सुप्रसिद्ध आधुनिक "तानसेन" रहिमतखा यांची बिछायत थाटलेली होती. विष्णुपंत नि खांसाहेब दोघे गुरुबंधू, एकाच उस्तादजीजवळ गायनविद्या शिकलेले, पंतांनी जन्मभर खांसाहेबाना पाठच्या भावासारखे लेखून, पोटच्या पोरासारखे त्याचे हवे ते लाड नि लहरी पुरविल्या होत्या. रहिमतखाना अफिणीचे व्यसन विलक्षण.. सदानकदा धुंद. स्वभाव मनस्वी लहरी नि तालेवार, एका विष्णुपंताखेरीज कोणाकोणाला स्वारी जुमानायची नाही, म्हणून पंत जातील तेथे खांसाहेबाना बरोबर बाळगावेच लागे त्यांना.
विष्णुपंतांच्या निधनानंतर सर्कशीचा कारभार नि रहिमतखांची जोपासना काशीनाथपंतांकडे आली. स्वच्छंदी नि लहरी खांसाहेबांचा प्रतिपाळ काशीनाथपंतांना कसा काय साधणार याची पुष्कळांना मोठी विवंचना होती. शिवाय विष्णुपंतानी त्याना अगदी लाडावून ठेवले होते. काशीनाथपंत म्हणाले, "आजवर आम्ही जंगली क्रूर जनावरांनासुद्धा माणसाळून हुकूमतीत ठेवले आहे. एवढे खासाहेब जर आम्हाला नजरेच्या हुकुमतींत बाळगता आले नाहीत, तर आमच्या विद्येची किंमतच झाली म्हणायची. थोड्याच दिवसांत काशीनाथपंतानी रहिमतखांना अशा कुशलतेने वळणावर आणले की "हां खांसाहेब, चलना देव" म्हणतांच स्वारी एकदम मोठ्या स्फूर्तीने गाण्याला सुरुवात करायची. त्यांच्या तैनातीचे लोकसुद्धा “छोट्या भाईने ऐसाऐसा कहा है" सांगतांच स्वारी हवे ते काम निमूटपणे करू लागली. पुढे तर काशीनाथपंतांच्या सर्कशीचा मुक्काम ज्या ज्या गावी असे, तेथे तेथे खांसाहेबांच्या गायनाचे मुक्तद्वार जलसे हुकमी होत असत. (पहा, आठवण नं. ११, पान ४९.)
काशीनाथपंतांच्या सर्कशीचा, मला वाटते, मुंबईचा तो अखेरचाच मुक्काम होता. बिजलीच्या गाड्या नुकत्याच चालू झाल्या होत्या एक दिवस खांसाहेबाना लहर आली. “छोटेभाई, मेरेको अभितक अपने बिजलीकी रेलगाड़ी तो नहि बताई रे" असे काशीनाथपंताना म्हटले. त्यांनी दोन नोकर लगेच बरोबर देऊन, खासाहेबांना अंधेरीपर्यंत वीजगाडीने नेऊन आणण्याचा हुकूम सोडला, नोकराने सेकण्ड क्लासचे तिकीट काढून खाँसाहेबाना अॅण्टरोडवर नीट बसवले नि ते शेजारीच थर्ड क्लासात बसले. अंधेरी लोकलच होती ती नि तिकिटेहि रिटर्नच होती. त्याच गाडीला जायचे नि न उतरता सवरता तिनेच परत यायचे, हा त्यांचा बेत
खांसाहेब नेहमी अफूच्या तारेत! चांद्रा स्टेशनवर काय वाटले खांसाहेवाना कोण जाणे. इतर पॅसेंजरांच्या बरोबर हेहि उतरले आणि गेले घोळक्याबरोबर स्टेशनच्या बाहेर निघून. अंधेरी स्टेशनावर नोकर तपास करतात तो काय! खांसाहेब डब्यात नाहीत! घाबरले बिचारे. सगळे डबे तपासले. पोलीसांना खबर दिली. दादर ग्रांटरोडपर्यन्त रेल्वे अधिकाऱ्यांची फोनाफोनी झाली. काहीच पत्ता लागेना.
छत्र्यांच्या छावणीत पोलिसानी ही बातमी नेताच मोठीच धावपळ नि धामधूम उडाली. मुंबईचे पोलीस, रेल्वेचे पोलीस, साष्टीचे पोलीस, यांच्या सेना रातोरात तपासाला निघाल्या. काशीनाथपंत संबंध रात्रभर जिकडे तिकडे टेलीफोन करीत जागत बसले. सर्कशीतले लोकसुद्धा तपासासाठी भराभर बाहेर पडले. त्या रात्रीचा सर्कशीचा खेळ बंद पडला. मुंबईत ज्याच्या त्याच्या तोंडी एकच बोलवा-
"छत्र्यांचे रहिमतखां एकाकी बेपत्ता"
दुसऱ्या दिवशीची स्थानिक दैनिके (टाइम्ससकट) मोठमोठ्या मथळ्यानी बाहेर पडली. खांसाहेबांचा पत्ता लावून देणाराला एक हजार रुपयांचे बक्षिस काशीनाथपंतानी जाहीर केले. सगळीकडे हाहाकार उडाला. एक दिवस नि दोन रात्री अशाच विवंचनेत गेल्या. पत्ता नाही. खुद खांसाहेबांची वृत्ति पहावी तर आधी अफीणधुंद कोणाशी घड काही बोलतील विचारतील सांगतील, असे काहीच नाही. पाय नेतील तिकडे जायचे नि कोठेतरी बैठक ठोकायची एवढेच त्याना माहीत.
विलेपार्ले त्या वेळी जवळ जवळ जंगल होते. वसती झालेली नव्हती. एका पहाटेला एक शेतकरी कामाला जात असताना, एका झुडपात कोणी त्याला गुणगुणत असल्यासारखे वाटले. भयभीत जवळ जाऊन पहातो तो एक म्हातारा दाढीवाला, चांगला जामानिमा केलेला, शेजारी मोठी चमकदार जरीची टोपी पडलेली, डोळे मिटून गाणे गुणगुणत आहे, असे दिसले, त्याने गावांत येऊन बॉब केली. पोलीस धावले. मुंबईला फोन झाले. स्वता काशिनाथपंत आणि त्यांची मंडळी धावली. ओळख पटली. काशिनाथपंतानी हाक मारतांच स्वारीने डोळे उघडले आणि जसे काही कोठेच काही झाले नाही अशा बेदरकार वृत्तीने हासत हासत विचारले, "देख छोटे भय्या, ए हमारे नौकर बिलकुल बेहय्या है. दोन रोज हुवे मेरे डिब्बीमि नहि दिया उन्ने, क्या आपने लाया है मेरी डिब्बी ?" काशिनाथपंतानी चटकन डबी पुढे केली. स्वारीने एक गोळी टाळ्याला चिकटवली आणि मुकाट्याने पंतांच्याबरोबर मुंबईला परत आली. दोन दिवस काय करीत होता म्हणून विचारले, तर उत्तर दिले, “गाना चलता था. बहोत मजा आई. सबलोक खूष हो गये." काशिनाथपंतानी त्या शेतकऱ्याला नि तपासाच्या कामी मदत करणाऱ्या सर्व मंडळींना रोख रकमा वाटल्या.
****
आठवण १७ वी
जी. आय. पी. रेल्वेच्या काही जुन्या गमति
(पाहिलेल्या, ऐकलेल्या नि वाचलेल्या)
`कमाल आहे बुवा या इंग्रेजांची!`
मुंबई प्रांतात रेलवे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेटजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेठ यानी केला. मूळजी जेठा, मोरारजी गोकुळदास, आदमजी पीरभाई, डेविड ससून वगैरे अनेक नामांकित नगरशेटजींचे अर्थात त्याना पाठबळ होते. सन १८५३ तर ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणेपर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला. लोखंडी रुळावरून विंग्रज आगीन गाडी चालवणार, ही कल्पनाच लोकांना मोठी आचव्याची वाटली.
अखेर मुहुर्ताचा दिवस जाहीर झाला. दिनांक १८ एप्रिल सन १८५३ सोमवार रोजी सायंकाळी ५ वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली. पाना फुलांचे हार, तोरणे, निशाणे लाऊन १० मोठे खोलीवजा डबे शृंगारलेले. इंजिनावर आंग्रेजांचे मोठे निशाण फडकत आहे. डब्यांत गादीच्या खुर्च्या, कोच. त्यांवर रेलवेचे सगळे डायरेक्टर, सर जमशेटची जिजीभाई, नाना शंकरशेट आणि अनेक इतर नागरशेट जामानिमा करून बसलेले. बरोबर ५ वाजता आगगाडीने कूड़क शिटीचा कर्णा फुंकून आपल्या भकभक फकफक प्रवासाला सुरुवात केली. मुंबई ते ठाणे दुतर्फा लाखावर लोक कलियुगातला हा विंग्रेजी चमत्कार पहायला आ वासून उभे होते.
ना बल, ना रेडा, ना घोडा आणि वाफेच्या जोरावर एक नाही दोन नाही दहा डब्यांची माळका खुशाल चालली आहे झुकझुक करीत लोखंडी रुळांवरून! कमाल आहे बुवा या विंग्रेजांची! आधीच, अंग्रेज लोक म्हणजे सीता रामाच्या वरदानाने हिंदुस्थानावर राज्य करायला आलेली लाल तोंडाची वानरे, त्यांच्यापुढे कोणाचे काही चालायचे नाही, अशा थापा क्रिस्ती मिशनऱ्यानी चोहीकडे लोकांत फैलावलेल्या. आता तर काय? विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून विंग्रेजानी वाफेलाच गाडी ओढायला लावले । छे, छे, विंग्रेज लोक खरोखरच देवावतार। बिचारा बहुजन समाज तर आश्चर्याने थक्कच झाला.
चला चला, ममईला मोफत चला
मुहुर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली. पण त्या वाफेच्या मुताटकीच्या गाडीत बसायचा लोकाना धीरच होईना. दुसऱ्या दिवसापासून लोकाना मोफत ढाणे ते मुंबई आणि परत नेण्या आणण्याची दौंडी पिटण्यात आली.
आगगाडीत बसणे धोक्याचे नाही, प्रवास लवकर नि सुखाचा होतो, हे लोकाना पटवण्याची रेलवेच्या कारभाऱ्यानी खूप आटापीट केली. पण लोकांत भलत्याच कण्ड्या नि अफवांचे पीक पिकले होते वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती भुताटकी आहे. मुंबईला नव्या इमारती नि पूल बांधताहेत, त्यांच्या पायांत जिवंत गाडायला फुसलाऊन माणसे नेण्याचा हा साळसूद डाव आहे. असल्या अफवांपुढे शहाणे प्रचारक काय करणार? एक दोन दिवस सरकारी कचेरीतले पांढरपेशे कारकून, व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे गुमास्ते याना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकाना दाखवले. त्यानी आपले अनुभवहि सांगितले. तेवढ्यानेहि कोणाचे समाधान होई ना.
अखेर दर माणसी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला. पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे घाटीलोक आगगाडीने जाऊ लागले का त्यांच्या घरची माणसे आजूबाजूला उभी राहून ठणाण धाय मोकलायची. त्यांची समजूत पाडता पाडता रेलवेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे. एकदा ते प्रवासी ठाणे मुंबईची सफर करून सुखरूप परत आले म्हणजे मग मात्र चौकशी करणारांचे घोळकेच्या घोळके त्यांच्याभोवती जमायचे. रुपयांचे इनाम पुढे आठ आण्यावर आले. नंतर चार आणे झाले. लोकांचा धीर चेपलासे पाहून, इनामे बंद झाली नि सर्रास तिकिटे चालू केली. एरवीचा ठाणे मुंबईचा बैलांच्या खटारगाडीचा प्रवास म्हणजे तब्बल एक दिवस खायचा. पण आता काय, अवघ्या सव्वापाच आण्यात आणि अवघ्या सव्वातासात ठाण्याचा असामी मुंबईला येऊ जाऊ लागला. मग मात्र लोकांची झुंबड लागली. सुरुवातीला सकाळ दुपार नि संध्याकाळ अशा तीनच गाड्या मुंबईहून सुटायच्या नि परत यायच्या. मुंबईहून भायखळा, दादर, कुरले, भांडूप आणि ठाणे अशी पांचच `टेसने` होती. (ही आठवण माझ्या आजीने मला सांगितली. त्यावेळी आमचे `घोडपकर` कुटुंब ठाणे येथे रहात असे.)
आठरा तासांत मुंबईहून पुणे
ठाण्याचा फाटा एकदम कल्याणला नेऊन, तेथून पुढे तो खोपवलीला पुरा करण्याचे काम सन १८५६ साली पुरे झाले. कल्याण ते खोपवलीच्या दरम्यान बदलापूर आणि नेरळ ही दोनच स्टेशने. मऱ्हाठशाहीत बैलगाडीचा रस्ता जसा खोपवलीहून चढत चढत खंडाळ्याला घाटमाथ्यावर गेला, त्याच मार्गाने रेलवेचा फाटा वर चढवण्याची पहिली योजना होती. पण पहाणी केल्यावर इंजनेरानी ती अशक्य ठरविली. इकडे इंजनेर लोक कर्जत पळसधरीपासून बोरघाट पोखरण्याची योजना ठरवीत असतानाच, खंडाळ्याहून पुण्यापर्यन्तचा सपाटीचा रेलवे रस्ता सन १८५८ च्या फेब्रुवारीत पुरा झाला, त्याचाहि मोठ्या थाटामाटाने `ओपनिंग शिरोमणि` करण्यात आला. खंडाळा पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगांव अशी दोनच स्टेशने ठेवण्यात आली. रस्ता एकेरीच होता.
बोरघाटाचे काम चालले असतानाच मुंबई पुण्याचा रेलवे प्रवास ज्यारीने चालू झाला. कसा ती मौज ऐका आता, पुण्याची गाडी खंडाळ्याला आली का सगळ्या पासिंजराना तेथून पालख्या, डोल्या, खुर्च्या नि बैलगाड्यात बसऊन घाटाखाली खोपवलीला आणायचे. ठाकूर कातकरांच्या डोक्यांवर त्यांच्या सामानांची ओझी द्यायची. सगळा काफिल्ला खोपवलीला आला का तेथे पुन्हा आगगाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे. प्रवाशांची ही घाट उतरणाची सुखसोयी नि सरबराई पहाण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी नांवाच्या एका पारशी व्यापाऱ्याने घेतलेले होते. घाटउतरणीचे चार तास धरून, पुणे ते मुंबईच्या रेलवे प्रवास अवघ्या आठरा तासांत व्हायचा, याचेच ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे.
पुढे जाता येत नाही? मागे जा
पालखी डोल्यांच्या मध्यस्थीचा पुणे मुंबई रेलवे प्रवास चालू असतानाच, कर्जत पळसधरी वरून बोरघाट खोदण्याचे काम होत होते. मुख्य इंजनेर मि. कुक नावाचा गोरा असामी होता. घाटमाथ्यावर रेलवे आल्यावर सध्या ती जशी २५ नंबरच्या छोट्या बोगद्यातून सरळ पुढे २६, २७ नि २८ बोगद्यातून थेट खंडाळ्याला जाते, तशीच मूळ योजना होती. पण २५ आणि २६ नंबरच्या बोगद्यांच्या दरम्यान मधोमध दोन अडीच फर्लांग लांबीची एक भयंकर खोल दरी होती. ती बुजवणे किंवा तिच्यावर पूल बांधणे दोनीहि गोष्टी त्या वेळी दुर्घट होत्या. दरीची खोली भयंकर, तेथले जंगल घनदाट भयंकर आणि वसतीला राहिलेले आस्वल लांडगे वाघादि प्राणीहि भयंकर (ही दरी पाहिलेले माझ्यासारखे हजारो लोक आज हयात आहेत.)
या दरीच्या तोंडाशी रेलवे आंखणी आल्यावर मोठी पंचाईत झाली. दरी ओलांडून पुढे तीन बोगदे पाडल्या शिवाय खंडाळा गाठता येत नाही आणि दरी तर ओलांडता येत नाही शिवाय रेलवे कंपनीजवळ आणखी तीन बोगद्यांचा खर्चहि सोसण्याची ताकद नाही. फार फार तर एकदा बोगदा पाडा नि कसेहि करून खंडाळा गाठा, अशी निकड लागली. बिचारा कुक इंजनेर कपाळाला हात लाऊन बसला. त्यांची प्रकृति बिघडत चालली. त्याचे अन्नहि तुटले. सबंध घाट आंखताना नि फोडताना त्याने शेकडो बिकट अडचणीची त्रांगडी सफाईत सोडवली. पण या दरीपुढे त्याने हात टेकले! `अलिकडे तुम्ही असे खंगत का चालला आहा? काय होत आहे तुम्हाला?" वगैरे पुष्कळ खोदखोदून त्याला त्याच्या बायकोने विचारले.
अखेर एक दिवस तो वैतागून म्हणाला, `त्यात तुम्हा बायकाना काय कळणार? आमच्या अडचणी आम्हाला माहीत.` `पण अडचण काय ती तर मला सांगा.` ती म्हणाली. कुक मोठ्याने ओरडून म्हणाला. "मला पुढे जाता येत नाही." ती हासून सहज म्हणाली. “हातेच्या! एवढेच ना? पुढे जाता येत नसेल तर मागे जा." हा विनोद झाला खरा. पण कुक त्यावर गंभीरपणाने विचार करू लागला. त्याने सगळे प्लान आपल्यापुढे पसरले आणि एकदम उसळी मारून तो ओरडला, "होय, बरोबर कोडे सुटले. पुढे जाता येत नाही. म्हणून मी आता मागेच जाणार." त्याने रेलवे अधिकाऱ्याना नदी आखणी दाखवली. "हे पहा, दरी पडू द्या आहे तेथेच. उलट दिशेने फाटा मागे नेऊन, तुमच्या सूचनेप्रमाणे एका बोगद्याने मी खंडाळ्याला जातो. पण एका अटीवर दहापेक्षा अधिक डबे तुम्हाला घाटावर पाठवता येणार नाहीत. कबूल असल्यास हा माझा रिव्हरसिंगचा (तोंडपरतवणीचा) नवा नकाशा.
रिव्हरसिंगचा मनोरम देखावा
इंजनेर कुकने बोरघाटात आणि पुढे थाळघाटातहि ही रिव्हससिंगची कल्पना लढवून एक मोठा चमत्कार निर्माण केला होता. दरीच्या तोंडाशी त्याने एक मोठा दगडी पूल बांधला. खालून किंवा वरून गाडी आली, का ती या पुलावर थांबायची. तिचे पुढचे इंजीन सोडून ते आगगाडीच्या मागल्या डब्याला जोडायचे. मागल्या बाजूला प्रचंड दगडी तट बांधून तेथून खंडाळ्याच्या दिशेने आगगाडी उलट तोंडाने जाण्याचा रस्ता बांधला होता. वाटेत फक्त एकच मोठा बोगदा असे. त्यातून गाडी बाहेर पडली का एकदम खंडाळा स्टेशनात. पुण्याकडे तोंडे करून मुंबईहून निघालेल्या प्रवाशाना आपण उलट चाललो का काय, असे वाटायचे. रिव्हरसिंग हे एक स्टेशन होते. तेथे सगळे प्रवासी खाली उतरायचे. दरीचा देखावा. मावळतीला दूरवर दिसणारा समुद्राचा भाग आणि खाली दिसणारा खोपवली गांवचा पंचक्रोशीचा सुंदर निसर्गाचा नकाशा पाहिला म्हणजे प्रवासाचे सारे श्रम हरवून जायचे.
ठाकूर कातकरी तेथे जंगली गोड फळे विकायला आणायचे. नव्या योजनेने सध्याची वीजगाड़ी हवे तेवढे लांबलचक डब्यांचे लचांड घेऊन सरळ धावा घेत खंडाळा गाठीत असली, तरी ते जुने रिव्हरसिंगच्या पुलावरचे रम्य निसर्गदर्शन आणि गाडीची तोड परवतणीची कसरत कधीहि न विसरता येण्याइतकी आकर्षक होती खास खंडाळा घाटात सहल करायला जाणारानी आजहि तो कुक इंजनेराचा दगडी पूल आणि तेथून सरळ मार्गे परतण्यासाठी बांधलेला प्रचंड उंचीचा दगडी तट पहाण्यासारखा आहे. मात्र पुढच्या बोगद्यांत प्रवेश करण्याच्या भानगडीत कोणी पडू नये, कारण तो आता वहिवाटीत नसल्यामुळे तेथे अनेक क्रूर श्वापदानी आपली राजधानी स्थापन केलेली आहे. (रिव्हरसिंगच्या मार्गाने मी खूप वेळा प्रवास केलेला आहे.)
खंडाळ्याहून खाली रिव्हरसिंगच्या पुलावर येताना मोठा घसरणीचा उतार लागत असे, अर्थातच वाटेतल्या मोठ्या बोगद्याच्या तोंडाशी गाडीला भक्कम ब्रेक लाऊन आस्ते आस्ते आणून क्षणभर उभी करायचे. लोकानी यावर एक अर्थ बसवला होता. बोगद्याच्या जागेवर एक देवी होती. ती सरकारला बोगदा पाहू देई ना. मग प्रत्येक गाडी येथे येऊन उभी राहील, शिटी वाजवून तुला सलाम करील, असा नवस केल्यावर बोगद्याचे काम सुरळीत झाले इतकेच काय पण रेलवेच्या कामगारानी बोगद्याच्या तोंडावर एका जागी शेन्दूर फासून तेथे देवीहि निर्माण केली होती. गाडी सलामीला उभी राहिली का लोक `पुंडलीक वरदा हारी विठ्ठल`चा गोंगाट करायचे.
खोल दरीवरचा हादरता पूल
सुरुवातीला १२ आणि १३ नंबरच्या बोगद्याच्या दरम्यान एक बरीच खोल दरी होती. तिच्यावर लोखंडी कमानीचा एकखांबी पूल बांधलेला होता. या पुलावरून गाडी अतिशय सावकाश न्यावी लागे. पुलावर गाडी चढली का तो विलक्षण हादरायचा, गोगलगाईच्या गतीने गाडी चालायची. पुलावर दोनी बाजूला पाच पाच फुटांच्या अंतराने पाण्याने भरलेली मोठमोठी पिंपे ठेवलेली असत. पुलाची हादरणी पिंपांतल्या पाण्याच्या हादरणीने अंदाजायला दोनी बाजूनी रेलवेचे पोर्टर नि अधिकारी हातात बावटे फडकवीत फूटबोर्डावर उभे असायचे. "आस्ते और आस्ते," असा त्यांचा ओरडा चालू असायचा. इकडे पूल तडाखेबंद हादरतो आहेस, पिंपातले पाणी डचमळते आहे, खाली खोल दरीचा देखावा लोक पहाताहेत आणि `पुंडलीक वरदा हारी विठ्ठल`चा जयघोष करीत आहेत. अशी या हादरत्या पुलावरची त्यावेळी मोज असे. आता तरी दरी बरीच बुजली असून, पूलहि चांगला दगडी झालेला आहे.
पूर्वी तीन बावटे असत
पूर्वी पांढरा, हिरवा आणि तांबडा असे तीन बावटे असत. खांबावरची सिग्नलची फळीहि तीन प्रकारानी पडत असे. लाल बावटा म्हणजे `एकदम सबूर` हिरवा म्हणजे `जा, पण जरा सावकाशीने जा.` पांढरा म्हणजे बेछूट जा, सब कुछ ठीक है. सिग्नलची ताठ फळी म्हणजे लाल बावटा, सध्या पडते तशी पडली म्हणजे हिरवा बावटा `सावकाशीने जा, आणि खांबाबरोबर सपशेल लोबती पडली का पांढरा बावटा-` `बेछूट जाना, पुढे पांढरा बावटा आणि सिग्नलफळीचे सपशेल पडणे बंद केले आणि हिरवा तांबडा या दोनच खुणा कायम राहिल्या.
खडक खोदणीतून वनस्पतिशास्त्र
हल्लीच्या सुधारलेल्या यंत्रयुगातल्या मंडळीना बोरघाटाच्या खोदणीचे कार्य केवढे भयंकर कष्टाचे आणि प्राणहत्येचे झाले असेल, याची कल्पनाहि होणार नाही. सगळे पथ्थर पोखरणीचे काम नुसत्या साध्या पहारीने मजुरानी केलेले आहे. लाखावर मजूर सारखे खपत असत. दररोज शेकडो अपघात व्हायचे. कोणाचे हात तुटायचे तर कोणाचे डोके फुटायचे. जखमी लोकांची कर गणतीच नाही. आत्ताच्यासारखी फर्स्ट एड`ची साधने किंवा डॉक्टरांच्या पलटणी थोड्याच होत्या? दहाबारा डॉक्टर असायचे जेमतेम, पण मजूर बेटे मोठे डोकेबाज तर कोठे कोणाला काही जखम झाली, हात मोडला, पाय दुखावला, कोणी कोसळून पडला का झटकन कोणीतरी आजूबाजूचा काही झाडपाला आणून उपचार करीत आणि तो रोगीहि थोड्याच दिवसात ठाकठीक होऊन कामावर रुजू व्हायचा.
कंपनीच्या गोऱ्या डॉक्टराना या उपचाराचे नवल वाटायचे. इंजनेर कुकचेहि त्या विलक्षण वनस्पतींकडे लक्ष्य वेधले. एरवी कोठल्याहि विलायति उपचाराने बऱ्या न होणाऱ्या जखमा नि निखळलेली किंवा पिचलेली हाडे वनस्पतींच्या लेपाने फटाफट बरी होतात कशी? काय चमत्कार आहे या वनस्पतींत असा? इंजनेर कुकाने वनस्पति-संशोधन चालवले. त्याला धोंडी महार नावाचा एक मजूर मदतीला मिळाला. त्याने बोरघाटातल्या सगळ्या वनस्पतींची माहिती दिली. कुकने प्रत्येक वनस्पतीचे नमुने जमवले. त्यांची पाणरंगांत हुबेहूब चित्रे रंगवली आणि वनस्पतिशास्त्रावर पायाशुद्ध माहितीचा एक मोठा इंग्रजी ग्रंथ लिहिला. "कुक्स फ्लोरा` (Cook`s Flora) म्हणून बॉटनीवरचा त्याचा ग्रंथ आजहि आधारभूत म्हणून मानला जातो. तो त्याने चोंडी महाराला अर्पण केलेला आहे. एका इंजनेराने वनस्पतिशास्त्रावर जेवढा मोठा ग्रंथ परिश्रमाने लिहावा, याचे नुसते कौतुक करण्यापेक्षा, आजच्या स्वातंत्र्ययुगात आमच्या भारतीय आणि महाठी तरुणाना कुकच्या उद्योगापासून पुष्कळ चैतन्य मिळवता येण्यासारखे आहे.
बोरघाटाने दरिद्रयाना श्रीमंत केले
पेशवाईच्या अखेरीला लोकांची जी धावपळ उडाली, तेव्हा शेकडो लोकांनी आपापली मालमत्तेची डबोली बोरघाटाच्या निर्जन दऱ्याखोऱ्यांत जागोजाग गाडून ठेवली. `स्थिरस्थावर झाल्यावर नेऊ काढून असा प्रत्येकाचा विश्वास! बोरघाटाचे खणणी खोदणीचे राक्षसी काम चालू झाल्यावर कुदळे पडे तेथे हंडे, पेटया नि पैसा दागिन्यानी भरलेली गोणती भसाभस बाहेर पडू लागली. ज्याला लग्गा लागला तो लांबवीत सुटला, हजारो मजूर मिस्री नि छोटे इंजनेर सगळ्यांचे पांग बोरघाटाने फेडले.
****
आठवण १८ वी
नाथमाधवाच्या विनोदाने सारा गांव बनला
सिंहगडावर वाघाची शिकार करीत असताना पाय घसरून नाथमाधवाचा कडेलोट झाला आणि पाठकण्याचे सारे मणके दुखावून कंबरेखाली तो जन्माचा जायबंदी झाला. मुंबईच्या विलायती उपचाराखाली बहुतेक सगळी प्रापर्टी खतम झाल्यावर, पनवेल येथील धूतपापेश्वर आरोग्यमंदीराच्या देशी औषधोपचारासाठी नाथमाधव पनवेल येथे बिन्हाड करून राहिला. वडाळा तळ्यावर शेट विठोबा खंडाप्पा गुळवे यांचा नंदनवनी बाग आणि राजेशाही बंगला होता. तेथे नाथमाधवाचे वास्तव्य होते. कोचावर किंवा खुर्चीवर नाथमाधव बसला तर हा माणूस आजारी आहे, असे कोणालाहि वाटायचे नाही. भरदार छाती, कसलेले पिळवटलेले दण्ड, मिशांचे आकडे वर चढविलेला लालबुंद गालांचा तो मर्दानी हसतमुख चेहरा पहाताच, कंबरेखाली या माणसाचा नुसता खुर्दा झालेला असावा, अशी शंकाही कोणाला येत नसे. उपचार काय? तर नारायण तेल लाऊन पाठकणा आणि कंबरेपासून खालचा भाग तासभर मळून मसळून घ्यायचा आणि नंतर एका खास तयार केलेल्या लाकडी पेटाऱ्यात नाथाला बसवून, तीत नाचण्याची ३-४ गोणती ओतून त्याला छातीपर्यंत तब्बल १२ तास गाडून ठेवायचे.
संध्याकाळी गरम पाण्याचे स्नान झाल्यावर गरम कपडे पांघरून मग कोचावर किंवा खुर्चीवर आणून बसवायचे, पेटीत बसल्यावर उद्योग काय? तर वाचनाचा तडाखा सारखा चालू. याच वेळी त्याने लेखनाचा उपक्रम चालू केला. प्रथम छोट्या छोट्या गोष्टी लिहून त्या मासिक मनोरंजन, करमणूक इत्यादि ललित साहित्याच्या पत्रात पाठविण्याचा क्रम ठेवला. पण `द्वारकानाथ माधव पितळे` या नावाने लेख जाऊ लागल्यामुळे, पितळे म्हणजे शोणार (सोनार), अँ, सोनार काय लिहिणार? या संभावीत विकल्पामुळे कोणीहि त्याच्या गोष्टी छापी ना. त्या परत यायच्या. अखेर मी त्याला युगत सुचविली, `यापुढे टोपण नावाशिवाय गोष्टीच लिहू नकोस आणि खरे नाव मेलास तरी कोणाला सांगू नकोस. पत्रव्यवहार टोपण नावानेच करीत जा.` त्याने नाथमाधव हे नाव पसंत केले. नागपूरला महाराष्ट्र वाग्विलास नावाचे एक मासिक गडकरी म्हणून एक रसिक चालवीत असत. मनोरंजनाने नाकारलेली एक गोष्ट वाग्विलासात प्रसिद्ध झाल्यावर, एके दिवशी खुद्द काशीनाथपंत मित्रानेच पत्र नाथमाधव, पनवेल, जि. कुलाबा` या पत्त्यावर आले.
अशाच गोष्टी मनोरंजनाला ही पाठवीत जा अशी विनंती केलेली होती हा लेखनाचा व्यासंग वाढता वाढता नाथमाधव पुढे एक मोठा मऱ्हाठी कादंबरीकार म्हणून नावलौकिकाला आला, हे सगळ्यांना माहीतच आहे. लेखनाचा श्रीगणेशा काढताना मी त्याला जांभळ्या शाईची जी दीक्षा दिली ती त्याने आमरण कायम राखली.नाथमाधवाचा स्वभाव मोठा रंगेल आणि विनोदी असे. सिहगडी अपघाताने जवळजवळ त्याला कायमचा परावलंबी, बलहीन, द्रव्यहीन केले तरी तशाहि अवस्थेत त्याने जीवन साफल्याचा कादंबऱ्या लिहून लोकाना रिझवण्याचा जो मार्ग काढला, त्यात त्याने संपूर्ण आनंद मानला. नाथमाधवाजवळ गेले का आनंदच आनंद, खेद विषाद निराशा त्याच्या आसपास टिकायच्याच नाहीत. सकाळ संध्याकाळ अनेक मोठमोठे लोक त्याला भेटायला यायचे. अनेक विषयावर वादविवाद चालायचे. माझे गुरुजी कै. कृष्णाजी नारायण आठल्ये, एडिटर केरळकोकीळ, हे पनवेलीसच होते वसतीला. ते आले म्हणजे तर काय काव्यशास्त्र विनोदाच्या संभाषणाना भरगच्च रंग चढायचा. शाब्दिक कोट्या नि विनोद करण्यात दादा एडिटर पक्के मुरब्बी, पण एक दिवस नाथमाधवाने असा एक विनोद भिरकवला का सारा पनवेल गांव गुळव्यांच्या बागेत धावत घुसला. ती आठवण सांगतो.
वर्ष काही आठवत नाही. (सन १९०५ असावे.) पण त्या वेळेला लंडनचा सुप्रसिद्ध आंग्ल मल्ल यूजीन सॅण्डो हा मुंबईला आला होता आणि तेथे त्याचे शारीरिक शक्तीचे प्रयोग आणि डम्बेल्सचा प्रचार चालू होता, `मी सॅण्डोला पत्र पाठवून पनवेलला भेट द्यायचे आमंत्रण दिले आहे आणि ७-८ दिवसात तो येथे येणार आहे, अशी अफवा नाथमाधवाने पिकवली. पाठविलेल्या पत्राची नक्कलहि त्याने सगळ्या मित्राना दाखवली. एके दिवशी दुपारी ३ वाजण्याच्या सुमाराला मला, आत्मारामशेट आटवणे, शंकरराव पत्की वकील, दादा आठल्ये, वगैरे पांच पन्नास मंडळीना आपल्या गड्याच्या हाती चिठ्या पाठविल्या की "मुंबरा मार्गाने यूजीन सॅण्डो मोटरीत बसून माझ्या बंगल्यात आलेला आहे. पत्रदेखत ताबडतोब भेटीला यावे."
त्या वेळी मोटारी नुकत्याच निघाल्याचे पनवेलकरानी फक्त ऐकले होते. मोटार पाहिली नव्हती. लंडनचा सॅण्डो आणि मोटार गाडी, दोनीहि गोष्टी पनवेलीला आलेल्या! अपूर्व योगायोग! मी तर धावतच निघालो. जाताना भेटेल त्याला ही बातमी ओरडून सांगत सुटलो. वाटेत मराठी शाळेतहि घुसलो आणि हेडमास्तराना ही नवलाची बातमी दिली. त्यानी एकदम सुट्टीची घंटा ठोकून शाळा सोडली. शाळेतली सगळी माकडसेना `सॅण्डो पहायला चला, सॅण्डो पहायला चला,` असा कल्होळ करीत माझ्या मागे धावत सुटली. झपाट्याने मी पुढे चाललो आहे आणी मागे मुलांचा घोळका. गांवातले कितीक तरी लोक आमच्या मागे येत होते.
बागेत शिरलो. तेथे पहातो तों विशेष गडबड कोठे काही नाही. बंगल्यात गेलो तो तेथेही थंडा थंड कारभार एवढा मोठा सॅण्डो आलेला, काही तरी धामधूम दिसावी? पहातो तो नाथमाधव नाचणीच्या पेटाऱ्यात बसला आहे आहे निवांतपणे खर्डी घाशीत. मला पहाताच एकदम मोठमोठ्याने लागला हसायला. `कायरे, कुठं आहे सॅण्डो?` तो आपला हासतच सुटला. जबाबच देई ना. बंगल्याबाहेर शाळेतल्या पोरांनी तर गोंगाटाचा कहर चालवला होता. इतक्यात निमंत्रित मोठमोठी मंडळीहि आपापल्या गाड्यांत बसून येत होती, आणि हा शहाणा नुसता खोखो हासतो आहे! मी चिडलो. सॅण्डो दाखव, नाहीतर फोडतो तुझे डोके,` असे गरजलो. नाथमाधव अगदी शांत मुद्रेने हासत हासत म्हणाला, "अहो शहाणे, आज तारीख कोणती?" मी म्हणालो, `पहिली एप्रिल.`
नाथ- झाले तर मग तुम्ही सारे एप्रिल फूल आहात.
मी- अरे पण नाथा जरा बाहेर पडा. शाळेतली ही शंभर दोनशे पोरे आली आहेत. गांवकरीहि लोटले आहेत. निमंत्रित पाहुण्याचीहि रीघ लागत चालली आहे. सगळ्या गांवभर भी डांगोरा पिटला. आता त्या सगळ्याना काय उत्तर देऊ मी?
नाथ- उत्तर काय द्यायचे, हा घे पांढरा कागद चिकटवून ठेवलेला कार्डबोर्ड काढ त्यावर तुझ्या ठसकेबाज अक्षरानी लिहून, का तुम्ही सारे एप्रिल फूल आहात.
जाड्या लेखणीच्या दांड्याने मी बोर्ड लिहिला आणि बंगल्याच्या पोर्चपुढे टांगून ठेवला. पनवेलसारख्या गांवढ्या गांवकरी लोकाना तो एप्रिल फूलचा विनोद काय कपाळाचा समजणार? अखेर मला तेथे थोडी व्याख्यानबाजी गाजवावी लागली. शाळेतली पोरे "सॅण्डो मोटार सगळी थाप. ठाकऱ्यांची हुर्यो" करीत ओरडत परत गेली. निमंत्रित मंडळी मात्र बोर्ड वाचताच चमकली. सगळेजण मग उघड्या बगिच्यात जमले. नाथा म्हणाला "आजवर आठल्ये दादा आणि इतर मंडळी मला विनोदी कोट्या करून चीत करीत आले. म्हटलं पहावे आपल्यालाहि काही पद्धतशीर विनोद करता येतो का नाही ते," चहापान झाल्यावर नाथमाधवाच्या एप्रिल फूल विनोदाचे कौतुक करीत सभा विसर्जन झाली.
पण अखेर यूजीन सॅण्डोला पनवेल येथे भेट देण्याचा योग आलाच. कसा ते पुढच्या आठवणीत पहा.
****
आठवण १९ वी
करेल्यानी डम्बेल्सना जिरवले
विठोबा खंडाप्पा गुळवे म्हणजे एका काळी पनवेलचे राजा भोज होते. अनेक कलावंताना त्यांनी आश्रय देऊन नामांकित केले. आण्णासाहेब किर्लोस्करांच्या नाटक मंडळीचे त्यानीच पनवेल येथे पुनरुजीवन केले. ब्राम्हण आळीत गोडबोल्यांच्या माडीवर बसून आण्णासाहेबानी रामराज्यवियोग नाटकाचा खर्डा तयार केला. `सुटला पितृदिशेचा वारा ही लावणी चातुर्मासाच्या सुरुवातीला खंडाप्पांच्या वडाळा तळ्यावरील बागेत पावसाळी तुफानाचा देखावा प्रत्यक्ष पाहून आण्णासाहेबानी शीघ्रकवित्वाने रचलेली आहे.
कै. आत्मारामशेट आटवणे हे विठोबा खंडाप्पांचे नातू (मुलीचे मुलगे.) माझे बाळमित्र. पहिल्यापासून आत्मारामशेटला तालिमबाजीचा मोठा शोक. त्यांच्या वाड्यात पहिलवानी हौदा तयार केलेला होता आणि अनेक तरूण मंडळी तेथे नियमित दण्ड, जोर, बैठकी, काढायला आणि कुस्त्यांच्या लढति खेळायला जगत असत. आत्मारामशेटने मोठमोठे जडजड मुग्दल नि करले सहज लीलेने फिरवून, अतिशय सुंदर शरीरसंपदा कमावलेली होती. तुळतुळीत हजामत केलेल्या मस्तकाने एडक्यासारख्या भितीवर थडथड टकरा घेऊन तो चुन्याचे थर फटाफट कोसळावीत असे.
यूजीन सॅण्डो मुंबईला आल्याचे समजले होतेच. तशात नाथमाधवाची एप्रिल फूलची मौज अनुभवल्यावर, "कायरे आपण आमंत्रण दिले तर सॅण्डो येईल का पनवेलला?" आत्मारामने मला विचारले. "आपण त्याचा जाण्यायेण्याचा खर्च आणि वर काही बक्षिस देऊ." मी म्हटले `दक्षणा मिळत असल्यावर त्या विलायती भटाच्या तोंडाला तेव्हाच पाणी सुटेल. चल आपण त्याला पत्र पाठवू.
आम्ही पत्र लिहिले. सॅण्डोने आत्मारामचे आमंत्रण स्वीकारले, पण या गोष्टीचा नाथमाधवाला आम्ही मागमूसहि लागू दिला नाही. एका दिवशी भरतीच्या पाण्यावर स्टीम लाँचने सॅण्डो आणि त्याचा एक सेक्रेटरी पनवेलच्या बंदरात उतरले. आम्ही दोघे सामोरे गेलो. आत्मारामशेटच्या घोड्यांच्या गाडीतून पाहुण्याना घेऊन आम्ही तडक बागेकडे गेलो. आत जाऊन नाथमाधवला मी सांगितली. `नाथा, यूजीन सॅण्डो आलाय. तो बघ बाहेर बागेत फिरतो आहे. आत्मारामशेटच्या बरोबर" नाथाला ती थट्टाच वाटली. "हैं! भलत्याच वेळी एप्रिल फूल बनणारा मी नव्हे राजा. मी तुम्हाला बनवले. तुम्ही काय मला बनवणार?" इतक्यात आत्मारामशेट सॅण्डोला घेऊन दिवाणखान्यात येताच, नाथमाधव चकितच झाला.
आश्चर्याने आ वासून पहातच राहिला. "केली बुवा तुम्ही आमच्यावर कडी" असे म्हणून त्याने पेटारी कैदखान्यातून शेकहॅण्डसाठी सॅण्डोला आपला हात पुढे केला.
परिचय विधि, अल्पोपहार वगैरे उरकले. गावातली अनेक प्रतिष्ठीत मंडळी जमली. नंतर सॅण्डोने कपडे काढून आपले काही शारीरिक प्रयोग करून दाखवले आणि डम्बेल्सचे जागतिक महत्व वर्णन केले. स्नायूसंवर्धनासाठी डम्बेल्स हा मी मोठा अपूर्व शोध लावला आहे, असे तो वरचेवर सांगत होता.
आंगात कपडे घातल्यावर आत्मारामशेट हा कोणी पेहलवान आहे, त्याचे शरीर कमावलेले आहे, असे कोणालाच कधि वाटत नसे. हौद्याच्या मुलतानी मातीत रंगणारे त्याचे अनेक दोस्तहि तेथे आले होते ते सॅण्डोच्या वल्गना ऐकून गालांतल्या गालांत हसत होते. आत्मारामशेटनी डम्बेल्सची दीक्षा घ्यावी आणि शरीर कमवावे, असा सॅण्डो जेव्हा आग्रह करू लागला, तेव्हा आत्मारामशेट आपले कपड़े उतरून लंगोटबंद त्याच्यापुढे उभा राहिला. त्याने प्रथम नुसत्या श्वासोच्छवासाने स्नायूंचे वर्धन संकोचन करून दाखवले. नंतर मुग्दलांच्या प्रचंड जोड्या मागवल्या आणि त्यांचे नि करेल्यांचे असे काही सपाटेबंद हात करून सॅण्डोला दाखवले का तो खरोखरच आ वासून टकमक पहातच बसला.
`हे पहा साहेब, तुमच्या डम्बेल्सनी फार फार तर दण्ड छाती है भाग कमावले जातील, पण आमच्या बैठका, जोर, जोडीच्या व्यायामाने आपादमस्तक शरीर हे असे कमावले जाते. हे आत्मारामशेटने सॅण्डोला पटवून दिले. सॅण्डोने एक करेल्याची जोडी उचलून ती फिरवण्याचा प्रयत्न केला पण ते काही त्याला जमले नाही. शारीरिक कमावणीचे धडे हिंदुस्थानला द्यायला येणारा मी पहिलाच विलायती शहाणा, ही त्याची गुर्मी आत्मारामशेटनी पनवेलला पक्की जिरवली. नंतर त्याला घरी वाड्यात नेऊन हौदा दाखवला. काही मित्रांच्या कुस्त्यांची लढत दाखवली. स्वताहि एक लढत मारली. रात्री हिंदू पद्धतीची सुग्रास मेजवानी आणि शंभर रुपये नजर करून, दुसऱ्या दिवशी भरतीच्या वेळी बंदरावर नेऊन त्याची रवानगी केली.
****
आठवण २० वी
लो. टिळक आणि दण्डधारी नाटक
सन १९०४ साल असावे. पुण्यात महाराष्ट्र नाटक मंडळी, हल्याळकरांची कंपनी, बेळगांवकर स्त्री संगीत नाटक मंडळींच्या छावण्या गरजत होत्या. अधूनमधून गणपतराव जोशी यांच्या शाहूनगरवासी नाटक मंडळीचेहि प्रयोग चालूच होते.
आर्यभूषण थेटरांत बेळगांवकर स्त्री संगीत नाटक मंडळीचा नेवाळकर कृत `दण्डधारी हा नवा नाट्यप्रयोग भरगच्च चाललेला होता. (त्या वेळी आर्यभूषण थेटर एकमजली जिवंत होते. आता मजला पडून ते तळमजली एकछपरी तमाशाचे गृह बनले आहे). जहाल मवाळ बादाचा हंगाम अगदी दुथडी भरून चालला होता. जहाल पक्षाचे पुढारी लो. टिळक आणि मवाळांचे अग्रणी नामदार गोखले. या वादाला अनुलक्षून नेवाळकरानी दण्डधारी नाटकाची रचना केलेली असल्यामुळे, त्याला हंगामी लोकमान्यता मिळाली होती. शिवाय आणखीहि एक मोठे आकर्षण होते. बेळगांवकर नाटक मंडळीत पुरुष किंवा स्त्रियांच्या सगळ्या भूमिका स्त्रियाच करायच्या. कंपनीची मालकीण व्यंकम्मा ही दण्डधारी नाटकात टिळकांची भूमिका इतकी हुबेहुब घेऊन रंगभूमीवर यायची का प्रत्यक्ष टिळकच आल्यासारखे वाटायचे. चालण्या बोलण्याची ढब, सुपारीचे खांड तोंडात टाकण्याची सफाई, खांद्यावर उपरणे टाकण्याची लकब अगदी कमाल बेमालूम करायची.
लो. टिळक सहसा कधि नाटकाला जात नसत. होतो कोठे त्याना वेळ नि फुरसद? रात्रंदिवस सारी हयात या ना त्या राजकीय भानगडीत गुरफाटलेली. पण एकदा तरी त्यानी ही दण्डधारीची भूमिका पहावी, अशी काही मंडळीची खटपट चालू झाली. हो ना करता अखेर टिळक `थोडा वेळ येऊन पाहीन` एवढ्यावर तयार झाले.
दण्डधारी नाटकाला आज टिळक स्वता येणार, अशी भूमका पुण्यात पसरल्यावर काय राव विचारता! आर्यभूषण छपरापर्यन्त खचून भरले. टिळक आले, टाळ्यांचा गजर झाला, दण्डधारीच्या भूमिकेत व्यंकम्माहि आली. दुप्पट टाळ्यांचा गजर झाला. आश्चर्याची गोष्ट, स्वता टिळकानी टाळ्या वाजवल्या नि मोठ्याने हासले पहिला अंक झाल्यावर टिळक परतणार होते, म्हणून त्याना रंगभूमीवर आणले. हारतुरे झाल्यावर, लोकमान्य म्हणाले, "आज या इथं माझं सोंग मला दाखवण्यात आलं, जसा नाटकाना मी फारसा जात नाही. तसा आरशातहि मी कधी माझं तोंड पहात नाही. आहे कुठे मला इतकी फुरसद? पण आता इथं मी पाहिलेला प्रकार खरोखरच कौतुक करण्यासारखा. एकाद्या माणसाची इतकी हुबेहुब प्रतिमा दाखवण्यात या कंपनीच्या मालकीणवाईचे चातुर्य तुम्ही वर टाळ्या वाजवून वाखाणलेच, मलाहि नवल वाटले. तशात एकाद्या नाटकात आमच्या गोपाळरावाची...
"आहेतच की ते या नाटकात", श्रोतृसमूहातून ओरडा झाला. टिळक-अहो हा गोपाळराव गोखले तर आमचा आहेच स्नेही. रोज आमच्या गाठीभेटी होतात. मी गोपाळराव म्हणतो तो गोपाळराव आगरकर, त्या आगरकराचे असेच हुबेहूब सोंग कधी रंगभूमीवर आले तर मला ते पहाण्याची फार इच्छा आहे. प्रत्यक्ष भेटीसारखाच योग असतो तो.
स्वताचे सोंग पाहून टिळकाना गोपाळराव आगरकरांची आठवण झाल्याचे ऐकून श्रोतृवृंदाला गहिवर आला. टाळ्यांच्या कडकडाटात टिळक घरी परत गेले.
****