हिंदुजनांचा ऱ्हास आणि अधःपात
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
पहिल्या आवृत्तीविषयी
हिंदुजनांचा ऱ्हास आणि अधःपात
बॅरिस्टर एस. सी. मुकर्जी कृत
THE DECLINE & FALL
OF THE HINDOOS
नामक इंग्रेजी ग्रंथाचा मराठी अनुवाद
अनुवादक, मुद्रक व प्रकाशक
केशव सीताराम ठाकरे
प्रबोधन मुद्रणालय, ३४५ सदाशिव पेठ,
पुणे शहर
किंमत एक रुपया
हे पुस्तक श्रीयुत केशव सीताराम ठाकरे यांनी प्रबोधन मुद्रणालय, ३४५ सदाशिव पेठ, पुणे शहर येथे छापून प्रसिद्ध केले. या मराठी अनुवादाचे व त्यावरून इतर देशी भाषात भाषांतरे करण्याचे सर्व हक्क श्री. ठाकरे यांच्या स्वाधीन आहेत.
पुस्तके मागविण्याचा पत्ता
व्यवस्थापक, प्रबोधन कचेरी, ३४५ सदाशिव पेठ,
पुणे शहर
अर्पणपत्रिका
अकाली तुटलेला तारा
प. वा. रामचंद्र वामन ऊर्फ बापूसाहेब चित्रे, बी.ए.
यांच्या दिव्यात्म्यास अर्पण
ग्रंथ परिचय
मराठी पेहरावात मऱ्हाठ्यांच्या हाती पडणारा हा निबंध प्रथम इंग्रजी भाषेत कोलकत्त्याच्या इंडियन रॅशनॅलिस्टिक सोसायटीच्या सभेत तारीख ७ सप्टेंबर १९१९ रोजी लेखक श्रीयुत एस. सी. मूकरजी, बार-अट-लॉ यांनी वाचला. सोसायटीच्या मासिक बुलेटीनच्या नोव्हेंबर १९१९च्या अंकात तो छापून प्रसिद्ध झाला. यातील विचारांचा विद्वज्जनात एवढा गौरव झाला की,कलकत्त्याच्या इंडियन डेली न्यूज पत्राच्या संपादकांनी हा निबंध ५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत आपल्या दैनिकाच्या अंकांत हप्त्याहप्त्याने छापून पुनर्प्रकाशित केला. त्यामुळे या निबंधाला इतकी विलक्षण मागणी आली की अखेर इ. रॅ. सोसायटीला तो पुस्तक रूपाने प्रसिद्ध करावा लागला. भारतमहर्षि डॉ. सर पी. सी. रॉय यांनी या निबंधाला प्रस्तावनेचा आशीर्वाद देऊन, ``भरतखंडाच्या पुनरुज्जीवनाचा खास संदेश’’ अशी त्याची सूत्रबद्ध स्तुती केल्यानंतर, प्रस्तावनेदाखल अधिक कोणी काही लिहिण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ``रंगविण्या लिलि धजला’’ या शेक्सपियरोक्ती प्रमाणे स्वतःस उपहासास्पद करून घेणेच होईल.
प्रस्तुत निबंधाचे इंग्रजी पुस्तक `डिकलाईन अँड फॉल ऑफ धी हिंदूज’ सन १९२० साली माझ्या वाचनात आले आणि त्याचा मराठी अनुवाद करण्याची प्रेरणाही त्याचवेळी माझ्या मनात आली. माझे परममित्र बॅरिस्टर मुखर्जी (पाटणा, बिहार) यांना हा मनोदय कळविताच, त्यांनी कसल्याही प्रकारच्या अटी न घालता मराठी अनुवादाची शुद्ध दार भावनेने आणि राष्ट्राभिमानाने परवानगी दिली. भाषांतरास सुरुवात केली आणि प्रबोधन पाक्षिकातून त्याच हप्ते छापण्यास १९२१ साली आरंभ केला. पुढे हे भाषांतराचे काम माझे स्वर्गवासी स्नेही व प्रोबधनाचे सह-उपसंपादक कै. श्रीयुत रामचंद्र वामन ऊर्फ बापूसाहेब चित्रे, बी.ए. यांनी सर्वस्वी आपल्याच हाती घेतले. गुदस्त साली त्यांचा अकाली शोचनीय मृत्यू होईपर्यंत, हे भाषांतर-प्रकाशनाचे कार्य हळुहळू प्रबोधनद्वारा होत होते.
गेली पाच वर्षे रेंगाळत पडलेले आणि बापूसाहेबांच्या निधनाने मध्येच अर्धवट तुटलेले हे कार्य संपूर्ण तडीला नेण्याची प्रेरणा गेल्या सप्टेंबरात उद्भवली आणि `शोधन -प्रकाश’ नामक स्वतंत्र ग्रंथाच्या लेखनाचे काम तात्पुरते बंद ठेवून, मी या कामाकडे वळलो. श्रीहरीच्या कृपेने हा ग्रंथ पूर्ण होऊन, आज आपल्या सेवेला सादर रुजू होत आहे.
बॅरीस्टर, मूकरजींनी वेदपूर्व काळापासून तो थेट मुसलमानांच्या स्वा-यांपर्यंत भारतीय इतिहासाची चिकित्सक छाननी करून, हिंदु जनांच्या –हासाची आणि अधःपाताची मीमांसा केली आहे. एका निबंधाच्या आकुंचित जागेतच हा सर्व मीमांसेचा चित्रपट त्यांना दाखवणे भाग पडल्यामुळे, त्यांची विवेचनपद्धती विहंगम निरीक्षणासारखी झालेली हे. `थोड्यात फार’ दिसावे, असी त्यांची धावती लेखनशैली असल्यामुळे, वाचकांनी फार सावकाश व मननपूर्वक चन केले तरच त्यांना `सूत्रातले सार’ स्पष्ट पटत जाईल.
बॅरिस्टर मूकरजी हे उच्चजातीय ब्राह्मणच असल्यामुळे, भिक्षुकशाहीची त्यांनी केलेली निर्दय छाननी वाचून, त्यांच्यावर ब्राह्मणद्वेषाचा आरोप करताना, इरसाल ब्रह्ममुखोत्पन्नांना तोंड नसले, तरी लाज वाटेल, असा मला भरवसा आहे. बॅरिस्टर मूकरजी हे भावनावश लेखक नाहीत,. त्यांच्य विधानांचा आणि चिकित्सेचा सर्व आवेश तिहाससिद्ध भरभक्कम पुराव्यांवरच विशेष असल्यामुळे, त्यांच्या सिद्धांताकडे आणि शुद्ध राष्ट्राभिमानाने केलेल्या अनेकविध सूचनांकडे विवेकी व विचारी हिंदुजनांचे आदरपूर्वक लक्ष वेधले जाणे अगत्याचे आहे. हिंदु जनांच्या सामाजिक आत्मप्रबोधनाच्या क्षेत्रात काम करणा-या समाजसुधारकांनाही आपापली कार्याची दिशा ठरविण्याच्या कामी अनेक उपयुक्त सूचनाचे भआंडार या ग्रंथाच्या अध्ययनाने आज खुले होतआहे.
हिंदुसमाजाच्या काळजाला झोंबलेल्या भिक्षुकशाही ब्राह्मणांच्या मुर्दाड स्वभाव-प्रवृत्तीची या ग्रंथात दिलेली इतिहासप्रसिद्ध चित्रे अत्यंत मननीय आहेत. हिंदुजनांच्या आत्मोद्धाराच्या प्रत्येक सुधारक चळवळीला जमीनदोस्त करण्याच्य कामी भिक्षुकशाही कधी नमते, कधी वाकते, तर कधी जुळते घेऊन, जरा थोडी संधी सापडताच, एकदम उचल खाऊन, एक दात पाडल्याचा सूड बत्तिशी ठेचून कसा उगविते, हेही अनेक उदाहरणांवरून स्पष्ट दिसून येते. भिक्षुकू वर्चस्वस्थापनेची कारस्थाने पार पाडण्यासाठी परक्यांना हाताशी धरून, वेळी त्यांचे पाय धरून, ब्राह्मणेतर स्वदेशबांधवांना चिरडून टाकण्याचे भिक्षुकशाहीने केलेल प्रयत्न, रजपूत विरुद्ध बौद्ध, शंकराचार्य विरुद्ध बौद्ध इत्यादी प्रकरणात निःसंदिग्ध पुराव्यानिशी आढळून येतात. बौद्धधर्माच्या पाडावाची भिक्षुकी कारस्थाने चालू मन्वंतरात विचारी वाचकांना नानाविध विचारांचे ब्रह्मांड खुले करून दाखवतील, यात मुला मुळीच शंका वाटत नाही. विशेषतः पृ. १५८वर बौद्धांच्या ससेहोलपटीतूनच आद्यशंकराचार्यांनी हिंदू समाजात अस्पृश्यता प्रथमच निर्माण केली, हा इतिहास विचार करण्यासारखा आहे.
कितीही आणि कसाही विचार केला तरी ``जातीभेदाचा पुरस्कार करणारी सामाजिक क्षेत्रांतली भिक्षुकशाही म्हणजे हिंदुस्थानाला जडलेली व्याधी होय.’’ हा भारतमहर्षि प्रफुल्लचंद्र रॉय याचा रोखठोक अभिप्रायच सर्वत्र प्रत्ययास येत आहे. असा स्थितीत या हिंदुभारताच्या आत्मोद्धाराचा मार्ग कसा चोखाळावा, हे प्रस्तुत ग्रंथाच्या वाचन मनन निदिध्यासाने अखिल हिंदू भगिनी बांधवांना नीट कळेल, असा मला भरवसा आहे.
देशबांधवांचा नम्र सेवक
केशव सीताराम ठाकरे
प्रबोधन कचेरी
३४५ सदाशिव पेठ, पुणे शहर.
ता. १ डिसेंबर १९२६
प्रस्तावना
श्रीयुत मुकर्जी यांचा `हिंदु जनांचा –हास वन अधःपात, हा प्रबंध मी वाचला व तो मला अत्यंत हृदयगंम वाटला. अभिनव भारताचा उषःकाल होत आहे. अशा वेळी भारताचे कल्याण चिंतणा-या प्रत्येक व्यक्तीने आपल्या राष्ट्रीय अवनतीचे प्रस्तुत प्रबंधात केले विचार-परिपूर्ण पृथःकरण अवश्य विचारात घ्यावे, असे मी निःसंकोच सांगतो. हा प्रबंध श्रीयुत मुकर्जी यांच्या दीर्घ परिश्रमपूर्वक केलेल्या अभ्यासाचे विचारपरिलुप्त असे फळ आहे. रोगाची कारण जर समजली नाहीत तर रोग कधीही बरा करता येणार नाही. हाच नियम आजच्या राष्ट्रीय अवनतीलासुद्धा लागू पडतो.
प्रस्तुत प्रबंध म्हणजे `भरतखंडाच्या पुनरुज्जीवनाचा खास संदेश’ आहे, असे माझे ठाम मत आहे. जातिभेदाचा पुरस्कार करमारी सामाजिक क्षेत्रांतली भिक्षुकशाही म्हणजे हिंदुस्थानाला जडलेली व्याधी होय. इतर अनेक गोष्टीपेक्षा या भिक्षुकशाहीनेच आमच्या प्रगतीला कुंठितकरून, राष्ट्रीय भावनांची कलमछाट केलेली आहे. सारांश, भिक्षुकशाही म्हणजे आमच्यावर्तमान दुर्दैवी अधःपाताची खाणचम्हटली पाहिजे. ज्या तोंडाने राजकीय हक्क आणि ब्रिटिश नागरिकत्वाचे अविछिन्न अधिकार मागण्यासाठी आम्ही मोठमोठ्याने वल्गना करतो, त्याच तोंडाने अवनत देशबांधवांच्या बुचाडून घेतलेल्या हक्कांना परत देण्याविशयी अथवा त्यांच्यावरील आपल्या सत्तेचा चाप लवमात्र ढिला करण्याविषयी, आम्ही कधी क ब्र तरी काढला आहे काय? वातावरणात आता लोकशाहीचे मेघ जमू लागले आहेत. सारे वातावरण लोकशाहीने दुमदुमू लागले आहे. अशा वेळी आमच्या अवनत देशबांधवांना जर आम्ही हात देऊन वर उचलणार नाही, उदार मनाने सामाजिक क्षेत्रांत योग्य ठिकाणी त्यांची स्थापना करणार नाही, तर राजकीय हक्कांसाठी नित्य चालणारा आमचा हलकल्लोळ म्हणजे पोकळ वल्गनांचा शुद्ध तमाशा होय, असे मानण्यास काही हरकत नाही. श्रीयुत मुकर्जी हे उच्चजातीय ब्राह्मण आहेत. तथापि हिंदू जनांचा –हास व अधःपात यांच्या कारणांची तात्विकदृष्ट्या मीमांसा करताना त्यांनी आपली सहृदयता आणि राष्ट्राभिमानाची तडफ अत्यंत उत्कटतेने व्यक्त केलेली आहे. माझ्या सर्व देशबांधवांनी प्रस्तुत प्रबंध अवश्य विचारात घ्यावा, असी माझी शिफारस आहे.
पी. सी. रॉय
धी युनिवर्सिटी सायन्स कॉलेज
२१ डिसेंबर १९१९
भाग १
प्रस्तुत निबंधाचा मथळा वाचतांच `गिबनकृत रोमन साम्राज्याचा ऱ्हास व अधःपात` या महाग्रंथाची वाचकांना आठवण झाल्याशिवाय राहाणार नाही. हाच मथळा माझ्या या निबंधाला मी का घेतला, अशी कोणी पृच्छा केली तर त्याला उत्तर हेच की माझा यत्न अल्पमतीचा असून अल्प सामुग्रीवर जरी उभारलेला आहे, तरी त्याचें धोरण काय असावें, याची या मथळ्यामुळें वाचकांना स्पष्ट अटकळ व्हावी. हातीं घेतलेल्या विषयप्रतिपादनाच्या मार्गांत अनंत अडचणी आहेत, याची जाणीव मला नाहीं असें नव्हे. विषयाचा व्याप तर इतका दांडगा आहे की कोणाचीही क्षणभर तिरपीट उडाल्याविना राह्यची नाहीं. परंतु रसिक वाचकवृंद माझें म्हणणें शांतपणानें, इतकेंच नव्हे तर अत्यंत कळकळीनें ऐकून घेईल, अशी मला खात्री असल्यामुळेंच, मनांत आलेले विचार दडपून टाकण्यापेक्षां स्पष्ट बोलून दाखविण्याचे धैर्य मला येत आहे. सुप्रसिद्ध इतिहासकार गिबन याचें ग्रंथकर्तृत्व त्याच्या अगाध बुद्धिसामर्थ्यास व लेखनकौशल्यास साजे शोभेसेंच आहे. यांत तिळमात्र शंका नाहीं. परंतु गिबन हा रोमन नसल्यामुळें किंवा रोमन साम्राज्याच्या अधःपाताशी त्याचें कांहींच सुहेरसुतक नसल्यामुळें, हा इतिहास आपल्या ओजस्वी लेखनकौशल्यानें त्याने जरी अजरामर करून ठेवला. तरी तो लिहीत असतां गिबनच्या अंतरात्म्यास आत्मत्वाचा चटका लागण्याचें कांहींच कारण नव्हतें, हें आपण विसरतां कामा नये. बोलून चालून गिबन पडला उत्तरदेशस्थ युरपियन; तथापि जात्याच कुशाग्र बुद्धीचा असल्यामुळे अधःपतन पावलेल्या रोमन साम्राज्याकडे त्याची इतिहासभिज्ञ विवेचन दृष्टी वळावी यांत कांही नवल नाही. ऐतिहासिक दृष्ट्या हा इतिहास गिबनला कितीहि जरी जिव्हाळ्याचा वाटला तरी तो त्याचा जिव्हाळा एखाद्या रसायनशास्त्रवेत्त्याच्या जिव्हाळ्यासारखाच असणार, अंतरात्म्याला आत्मत्वाचा पीळ पाडणारा जिव्हाळा नव्हे!
एखाद्याच्या मुलाने विष खाल्ले व त्या विषाचे पृथक्करण करण्यासाठी त्याला रसायन शाळेत आणले, अशा स्थितीत ते विष कोणत्या प्रकारचे आहे, हे समजावून घेण्याची रसायनशास्त्र्याची जी जिज्ञासा व जिव्हाळा, तोच त्रयस्थपणाचा जिव्हाळा रोमन साम्राज्याचा इतिहास लिहितांना गिबनच्या अंतःकरणांत होता; आत्मत्वाचा जिव्हाळा काही नव्हे! रोम किती झाले तरी गिबनला परकीच. माझी हिंदुस्थानाविषयीं तशी भावना असणें शक्यच नाही. भारतीय हिंदुजनतेचा आज कितीहि ऱ्हास अध:पात झालेला असला, तरी हिंदुस्थान ही माझी प्यारी मातृभूमी आहे, मी तिचा एक रहिवाशी आहे-नागरीक आहे, ही माझी भावना जागतीज्योत जिवंत असणारच अर्थात् माझी मातृभूमी अधोगतीच्या व अवनतीच्या दुर्गंधीनें नासून सडली आहे, असा कोणी परकीयांनी कितीहि गिल्ला केला तरी त्याकडे लक्ष देण्याचें मला काय प्रयोजन? या परक्यांचें काय घेता? बेटे उद्यां चंबुगबाळें खांकेंत मारून खुशाल आपल्या मायदेशाला सूं बाल्या ठोकतील! पण माझ्या मातृभूमीचा सत्पुत्र म्हणून कोणत्याही अवस्थेत मला येथेच राहणे भाग आहे, अशा भावनेनें वर्णन केलेली हिंदुजनांच्या ऱ्हासाची व अधःपाताची कहाणी अर्थातच निराळ्या मनोभूमिकेत रेखाटली जाणार, हे सांगणे नको. हिंदु-भारत साऱ्या जगाच्या सुधारणेची एक विलक्षण शक्ती आहे. तिचा परिणाम इतरांप्रमाणेच माझ्या कोट्यवधी देशबांधवावरहि होत आहे, या दृष्टीनें त्या शक्तीचा योग्य संदेश काय आहे, त्याची व्याप्ति केवढी आहे. यांचा मनःपूर्वक अभ्यास करणे मला अत्यंत आवश्यक आहे. हा प्रश्न असा तसा नव्हे, माझ्या जिव्हाळ्याचा आहे. ऱ्हास पावलेल्या व नामशेष उरलेल्या रोमन साम्राज्याबद्दल गिबनला या भावनेची जाणीव असणें शक्यच नाही.
आपल्या परमप्रिय हिंदुस्थान देशाचे प्राचीन ऐश्वर्याचे चित्र पाहिले तर काय दिसते? युगानुयुगाचा हिंदुस्थान. संतमहंतांचा हिंदुस्थान. त्याच्या प्राचीन धवलतम चारित्र्यानें हिमालयाच्या उत्तुंग धवलगिरीशींच स्पर्धा करावी. वेदोपनिषदांची ही जगन्माता. याच मातेच्या प्रेमळ हृदयांतून सांख्य आणि योग या आध्यात्मिक शास्त्रांच्या दुग्धधारा निर्माण होऊन, त्यांचाच पुढे बुद्ध आणि शंकर या महर्षीच्या उत्कृष्ट व उदारतम तत्त्वज्ञानाशी बिनतोड त्रिवेणी संगम झाल्यामुळें, नीतिप्रचुर अशा बिनमोल आध्यात्मशास्त्राची उत्पत्ति झाली. या शास्त्राचे स्वरूप तरी किती युक्तिसिद्ध, किती सर्वव्यापी आणि किती अत्युत्तम! विश्वाच्या कोड्याचा निरास करून चिकित्सक व साधक मुमुक्षूंच्या हातीं जन्ममृत्यूच्या गूढ तत्त्वनिरसनाची प्रत्यक्ष गुरुकिल्ली देण्याचा अग्रमान पटकविणारी ही आपली भारतमाता या पुराणश्रेष्ठ जगन्माउलीला माझा प्रमाण असो. वंदे मातरम्
मनुष्यप्राणी हा काही एकजात एकसारखा संस्कृत नसतो. कोणाची संस्कृति नीच, तर कोणाची स्वार्थी; कोणी जड असतात, तर कोणी विषयलंपट असतात; आणि कित्येकांच्या राक्षसी प्रवृत्तीमुळे त्यांच्यांत आणि पशूंत कांही भेदच नसतो. असल्या वृत्तीच्या माणसांना काबूत आणून त्यांच्या पाशवी संस्कारांना कधीं चुचकारून तर कधी दपटशा दाखवून, आस्ते आस्ते त्यांना खऱ्या माणुसकीला आणून पोहचविण्याचे कार्य मोठे कठीण आहे. या साठी आत्मज्ञान, आत्मपरिणति(आत्मसंस्कृति), स्वावलंबन आणि उत्कटतम नीतिमत्ता या गुणांचा प्रकाश त्या असंस्कृत प्राण्यांत मोठ्या कुशलतेने पाडावा लागतो. हा प्रकाश पाडण्याचे आणि वरील सर्व प्रकारच्या असंस्कृत वृत्तींना पद्धतशीर उन्नत करण्याचे धाडसी कार्य यशस्वी करून दाखविण्याच्या कामी-नराला नारायण स्वरूपाची आत्मप्रतीति आणून देण्याच्या कामी जगांतील सर्व राष्ट्रांपेक्षा हिंदुस्थानानेच अखेर सर्वांवर मात केली आहे. इतर सर्व गोष्टी सोडून दिल्या, तरी निदान या बाबतीत तरी आतापर्यंत हिंदुभूमीनें `जगद्ज्ञानमाता` ही आपली अद्वितीय आणि असामान्य श्रेष्ठता अजिंक्य कायम राखिली आहे; मग तिचा कोणी कितीहि विपर्यास करो! हिंदुभूमी ही गूढशक्तीची अधिष्ठात्री आहे. मग तिच्या मुखावर भविष्यकालदर्शक असें जें गंभीर विलक्षण हास्य अजूनसुद्धा चमकत आहे. त्याचे कारण काय? त्याचे कारण हेच की कसेहि बरेवाईट प्रसंग तिच्यावर येत असले, तरी `हेंहि दिवस निघून जातील` हा तिचा आत्मविश्वास अत्यंत प्रखर आहे.
प्राचीन काळी हूण शक, जाट, सिथिअन वगैरे रानटी व क्रूर संस्कृतीच्या लोकांच्या टोळधाडी हिंदुस्थानाला लुटून फस्त करण्याकरितां काय थोड्या थोडक्या येऊन कोसळल्या? परंतु त्या लोकांना सुद्धा चुचकारून व माणसाळून त्यांच्या रानटी प्रवृत्तीची नांगी अज्जिबात बोथट करण्याच्या कामी कोणाच्या उज्वल संस्कृतीचा पराक्रम यशस्वी ठरला बरे? हिंदुस्थानचीच लुटालूट करण्यास आलेले हे रानटी लोक अखेर हिंदमाउलीच्याच चरणी लागले, तिला त्यांनी आपली माता मानली आणि वैयक्तिक गुणकर्मानुसार चातुर्वर्ण्याच्या चार भव्य दरवाजांनी हिंदुसमाज-संघटनेत समरस होऊन जाण्यांत त्यांनी धन्यता मानली. म्हणजे निराळ्या शब्दांत स्पष्ट सांगायचे तरी ही परकीय मंडळी अखेर हिंदुसमाजाचे प्रत्यक्ष घटकांवयव बनले. मात्र येथें हें नीट लक्षांत ठेविले पाहिजे की त्यावेळी भिक्षुकशाही आतांप्रमाणे कुत्सित व वर्णविद्वेषी बनलेली नव्हती, जात्यंधपणा, कुटीलपणा, ताठरपणा किंवा कूपमंडूकी संकुचितपणा तींत अजून घुसला नव्हता आणि विद्वता संस्कृति व ज्ञान यांचे फायदे फक्त आपल्या विवक्षित जाती पुरतेंच वंशपरंपरागत मर्यादित करण्याची नीच वृत्ति भिक्षुकशाहींत बोकाळलेली नव्हती.
स्मृतीच्या कक्षेपार असलेल्या अत्यंत प्राचीन काळापासून हिंदमाता जगातल्या सर्व लेकरांना मोठ्या ममतेनें हांक मारून बोलावीत आहे व म्हणत आहे; की "बाळांनो! या. तुम्ही सर्व माझीच लेकरे आहात. विश्वात्मैक्य भावाचें प्रेम आणि मानवजातीची निरःसित निःस्वार्थी सेवा यांतून निर्माण होणारें समाधान आनंद व शांतिमिश्रित दुग्धाचें स्तनपान, लेकरांनो, मी तुम्हाला करविते. अभेदभावाने खुशाल या." आशियाखंडस्थ जनतेलाच अशा प्रकारचें आव्हान हिंदमातेने केलें असें नव्हे. तिचा साराच व्यवहार अभेदभावाचा. त्यांत खंडभेदादि भेद यांचा वास सुद्धां यावयाचा नाहीं. आशियाखंडाप्रमाणे ग्रीस व इजिप्त येथील जनतेला हिंदमातेने ज्ञान धर्म व संस्कृति याचे उदार मनाने घ्या घ्या म्हणून दान केलेले आहे. हिंदुस्थानांत हातमागावर विणलेली सुताची व रेशमाची कापडे, नाना तऱ्हेच्या कलाकुशलतेच्या वस्तु, यांवर बादशाही रोम अथेन्स अलेक्झांड्रिया व आशियाखंडस्थ इतर अनेक मोठमोठ्या देशांची मारे धूम उडी पडत असे.
भूतकाळी हिंदुस्थान म्हणजे दुधाचे व मधाचे पाट वहात असलेली सुवर्णभूमि होती. (या देशांत सर्व प्रकारची संपत्ति व समृद्धि विपुल होती.) हिंदुस्थानरूपी नंदनवनाचा आस्वाद फक्त हिंदुच घेत होते असें नव्हे, तर वाटेल त्या परदेशस्थ चहात्याला व रसिकाला सुद्धां या नंदनवनाचे दरवाजे खुले असत. हिंदुस्थानानें साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलेले होते. त्याच्या स्वर्गतुल्य ऐश्वर्याच्या कीर्तिदुंदुभीचा दणदणाट आशियाखंडाच्या उंच उंच पर्वतावरून व मैदानांवरून रोंरावत थेट पाश्चिमात्य युरपच्या ओसरीवर जाऊन धडकला. त्या दणदणाटाचा प्रतिध्वनि, हिंदुस्थानावर ऱ्हासाचा भयंकर पगडा पडल्यानंतर बऱ्याच काळानें, दिल्लीच्या मोंगल बादशाहीच्या ऐश्वर्यांत पुनश्च व्यक्त झाला. याचें प्रत्यंतर पहाणारांना दिवाण-इ-खास या बादशाही इमारतीच्या भिंतीवर "पृथ्वीवर जर स्वर्ग असेल तर तो येथें आहे, येथें आहे, येथेंच आहे" अशी रत्नजडित अक्षरांनी लिहीलेली साक्ष आज घटकेलाहि पहावयास मिळेल.
आपल्या थोर मातृभूमीच्या या हृदयंगम उत्कृष्ट चित्राच्या जोडीनें, त्याची हृदयविदारक निकृष्ट अशी दुसरीहि बाजू मला आपल्यापुढे मांडली पाहिजे. हिंदमातेच्या पायांपाशी घोंटाळणाऱ्या तिच्या मुलांची स्थिति आज काय आहे? कोणाच्या तोंडावर तेज नाहीं, क्षणोक्षणी मरणाच्या भीतीने गांगरलेले, दारिद्र्यामुळे पाठपोट एक झालेले, नानाविध दु:खांनी होरपळलेले, भलत्याच फंदांत भडकलेले, अशी आजच्या हिंदुंची स्थिति आहे. साऱ्या संस्कृत जगाच्या दृष्टीला हिंदु हा एक तिटकाऱ्याचा विषय होऊन बसला आहे. कोणी त्यांना होंडस म्हणतो, कोणी इन्डोस म्हणतो, कोणी जेन्टु म्हणतो (जन्तु किंवा हैदोस असे अजून म्हणूं लागले नाहींत हें नशीब!) माझी अशी खात्री आहे की (सध्याप्रमाणेच जर हिंदुजन आपले हात पाय पोटाशी आवळून स्वस्थ बसतील तर) असले वाक्प्रचार जगांतल्या सुधारलेल्या राष्ट्रांच्या शब्दकोशांतून आणि ज्ञानकोशांतून बिनधोक प्रगट होतील आणि त्यांना खालच्या सारखे कांहीं तरी विलक्षण अर्थ देण्यात येतील
:--
हिंदु म्हणजे कोण?
(१) हिंदुस्थानांत सापडणारी द्विपादांची एक जात.
(२) हिंदुस्थानांत सांपडणारी श्ववृत्तीची (अगदींच कुत्रा नव्हे,) बेवकूब अशा दोन
तंगड्या असलेल्या बावळटांची जात.
(३) एक प्रकारचा हिंदुस्थानी राक्षस. ही एक रानवट माणसांची पैदास आहे. त्यांना लाजलज्जा, मानापमान, सदाचरण आणि स्वातंत्र्य यांचे वारें सुद्धां लागलेले नसतें.
(४) अल्पवयातच मातृपद भोगणाऱ्या स्त्रियाचें पोटी जन्माला आलेली नैतिक दुबळ्यांची एक जात. ही फक्त हिंदुस्थानांतच सापडते.
(५) रानवट हिंदु संस्कृतीच्या नैतिक षंढांची एक जात.
अशा प्रकारची घाणेरडी माहिती सर्व संस्कृत राष्ट्रांनी एक मतानें जर जगभर पुकारली तर त्यांच्या एकवटलेल्या कलमांच्या फटकाऱ्याने सर्व हिंदु जनांना वर्तमान युरपियन संस्कृतीच्या क्षेत्राबाहेर गचांडी मिळण्यास अवकाश का आहे? दुर्दैवाने खरोखरच अशी स्थिति आली तर आम्हांला शिक्षणाकरिता, व्यापारधंद्याकरिता किंवा चैनीकरिता, जेव्हां जेव्हां पाश्चात्य देशांत जाण्याचा प्रसंग येईल, तेव्हां तेव्हां तिकडचे सारे लोक आमच्याकडे बोट दाखवून `हे पहा गचाळ हिंदु आले` असे म्हणू लागतील. हिंदु गचाळ अं? अवनत हिंदु? साऱ्या संस्कृत जगाचा हाच शेरा जर आमच्या कपाळी पडावयाचा असेल तर जगांतल्या कोणत्या हाय पिनकोडमध्ये या पेक्षां अधिक जलाल शिक्षेचा प्रकार सांपडणे शक्य आहे? या ठिकाणी आपण हे लक्षांत ठेवले पाहिजे की प्राचीन ग्रीक, एट्रुस्कन्स, रोमन्स, त्याचप्रमाणे नार्वे स्वीडन डेन्मार्क देशांत राहणारे जर्मन संस्कृतीचे लोक आणि महायुद्धपूर्वकाळी जर्मन साम्राज्याचा बराच मोठा भाग व्यापणारे जर्मन लोक, ज्या मूळहिंदु-आर्य (Indo-Aryan) मानव वंशापासून आपल्या उत्पत्तीचा हक्क सांगतात, त्याच उगमापासून आम्हा हिंदुंचाहि जन्म झालेला आहे. हिंदुसमाज हें एक राष्ट्र आहे, एक मोठा विस्तीर्ण मानवसमूह आहे, आणि त्याची एक विशिष्ट परिणत संस्कृतीहि आहे. अशा राष्ट्राचा समंजस जगाच्या न्यायमंदिरांत अपमान व्हावा, त्याची मानखंडना व्हावी, त्याला तुसडेपणानें वागविण्यांत यावें, न्यायाच्या घणाच्या एकाच ठोकरीने एकजात सर्व हिंदुंना शिध्ध्याच्या, नरमांस-भक्षकांच्या आणि रानटी लोकांच्या पंक्तीला बसण्यास झुगारून देण्यांत यावें आणि त्यांच्या शीलांवरही डांबर फांसण्यांत यावी; अन्यायाची केवढी ही परमावधि!
राष्ट्रीय अवनति व राष्ट्रीय अपमानाच्या या दुःसह प्रसंगीं, हिंदुस्थान देश हीच आपली जन्मभूमी-हीच आपली थोंर माता-ही भावना जागृत असणाऱ्या सर्व हिंदु मुसलमान क्रिस्ती पारशी जैन बौद्ध शीख जनांनी या गोष्टीचा एकमतानें विचार केला पाहिजे. आमच्या किंवा आमच्या पूज्य पितरांच्या हातून काय अशीं पातकें घडली की ज्या मुळे आमच्या शीलावर ही नामोशी फेंकण्यांत येत आहे; याचा सर्वांनी नीट काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. बांधवहो, एकाच मातृदेवतेच्या सत्पुत्रानों, हिंदु आणि मुसलमान, क्रिस्ती आणि पारशी, जैन आणि बौद्ध अथवा शीख, असे तुमचे निरनिराळे पंथभेद, मतभेद, धार्मिक आचार-विचार-भेद, सामाजिक रूढीभेद कितीहि असले, तरी या भेदांना सप्तसमुद्रपलीकडच्या त्या भव्य आणि विस्तीर्ण जगांत कवडीचीही किंमत नाही. तेथे धार्मिक आणि आनुवंशिक भेदाभेदांचे शुद्ध देशीय राष्ट्रीयत्वांत (Territorial Nationality) आमूलाग्र पर्यवसान होत असतें, हे लक्षांत ठेवा. त्या विस्तीर्ण जगांत हिंदु काय अथवा हिंदी (इंडिअन) काय, दोनही शब्दांची किंमत सारखीच (कवडीमोल) आहे; आणि हिंदुविरुद्ध ज्या बहिष्काराची तयारी चाललेली आहे, तो अमलांत आला कीं या दोन शब्दांऐवजी तितकाच निंद्य असा दुसरा शब्द इंडिअन डोमिसाइल (हिंदुस्थानांत माणसाळलेला) हा उपयोगांत आणला जाईल. यावर कोणी अशी पळवाट सुचवितील कीं मुसलमान, क्रिश्चन, पार्शी इ. मंडळी तरी निदान या बहिष्काराच्या रामरगाड्यांतून निसटतील. गोष्ट सोडून द्या. या रामगाड्यांत त्यांचीसुद्धा हिंदुमुसलमान, हिंदुक्रिस्ती, हिंदुपारशी या संज्ञेनें चटणी झाल्याशिवाय रहाणार नाहीं; आणि हिंदुंना जो राष्ट्रीय अपमान सोसावा लागणार तो त्यांच्याहि कपाळचा चुकणार नाहीं.
अर्थात् जो जो म्हणून हिंदुस्थानांत जन्मलेला असेल, मग तो हिंदु मुसलमान क्रिस्ती पार्शी कोणीहि असो, त्याने या प्रसंगाचा नीट विचार करण्याची वेळा येऊन ठेपली आहे. विचार! हा विचारच इतका भयंकर आहे की त्याचा उच्चार करतांना आमचे अश्रु ठिकच्या ठिकाणीं थिजतात व छाती भरून येते. या बाबतींत आमच्या देशी कायदे मंडळांत पसार केलेला अथवा खुद्द इंपिरियल ब्रिटीश पार्लमेंटानें जाहीर केलेला एखादा ठराव आमच्या उपयोगी मुळींच पडणार नाही.
बादशहाकडें, अमेरिकन प्रेसिडेंटाकडे किंवा राष्ट्रसंघाच्या अध्यक्षाकडे अर्ज्या पाठवून तोंड वेंगाडण्यात आमच्या राष्ट्रीय इभ्रतीला-जी कांही थोडीबहुत इभ्रत शिल्लक राहिली असेल तिलाहि-तें साजेशोभेसें दिसत नाही. पण आता काय उरलें आहे? निकाल दिला गेला. शिक्षाहि ठोठावली गेली. या शिक्षेवर अपील करण्याचीहि सध्या सोय नाहीं उद्यां परवां मात्र या अपीलाचा परिणाम घडवून आणण्याची एक बारीकशी फट आहे. आपण सर्व हिंदवासी जर एकजूट झालों, आम्हांला जगत्बहिष्काराची शिक्षा ठोठावणाऱ्यांच्या मनात आमच्या संयुक्त कर्तबगारीने जर आम्ही आदर व विश्वास उत्पन्न केला आणि आम्हीहि तुमच्या सारखीच (विचार-विकारमय) माणसे आहोंत असें त्यांना पटवून दिलें, तर त्यांची सदसद्विवेक बुद्धी जागृत होऊन या शिक्षेचें परिमार्जन करील. आशेला जागा एवढीच!!
प्रसंग येऊं नये, आला. अर्थात् सत्य, न्याय आणि हक्क या सनातन सर्वव्यापी तत्त्वांवर पूर्ण विश्वास ठेवून निधड्या छातीने आपण त्याला तोंड दिले पाहिजे; आणि आपल्या प्रिय भारतमातेप्रमाणे `यह भी दिन चले जायेंगे` हा विश्वास अढळ राखिला पाहिजे. आपल्या संत मंडळीनी आपल्या हृदयांवर एक बिनमोल उपदेश बिंबवलेला आहे. तो हा की कोणी कितीहि धि:कार करो, निंदा करो, आपल्या दुस्मानाची दुस्मानगिरी कितीहि करडी असो, तरी आपण आपला आत्मविश्वास निर्लेप ठेवून नुसतें स्मितहास्य करीत रहावें, आपण या जगड्व्याळ विश्वरचनेचे एक घटकावयव आहों आणि आपण आत्मप्रतारणा केली नाहीं तर त्या विश्वरचनेच्या सनातन नियमाने आपोआप बुऱ्याचे भलें होत असतें, या तत्त्वावर विश्वास ठेवून आपण खुशाल निर्धास्त रहावे. "हाती चाले अपने चालसे; कुत्ता भूकत वांकु भुंकवा दे." परंतु आपल्या पुढचा प्रसंग मात्र भयंकर आहे. अशा वेळी यावर जर कांही तोडगा शोधून काढावयाचा असेल तर तो आत्मनिरीक्षणानेच काढला पाहिजे.
एकजात सबंध राष्ट्राचा मानववंशाच्या शीलावर कलंक अं! केवढी ही मानखंडना! या मानखंडनेचें कारण शोधून काढण्यासाठी व कायमचें निराकरण करण्यासाठी आपल्याला एकांतांत आत्मशोधनच केलें पाहिजे. आमची विशिष्ट वंशसंस्कृति काय आहे, आमचा भूतकालीन इतिहास कसा आहे आणि आमच्या उत्पत्तीचा उगम कसा झाला, या गोष्टींचा आपण नीट विचार केला पाहिजे. हिंदुस्थानांत मुसलमानांचा धौशा सुरू होण्यापूर्वी साम्राज्यसत्तेच्या काळांत आमच्या हातून कोणकोणती बरी वाईट कृत्ये घडली, आणि त्यावेळी आमच्या गृहस्थधर्माची नीति व त्याचे वळण कोणत्या धर्तीचें होतें, याचेंहि पृथःकरण आपणांस केलें पाहिजे. इतकेंच नव्हे तर, आपल्या आत्मनिरीक्षणाची दृष्टी धर्माच्या क्षेत्राकडेसुद्धां वळविली पाहिजे, आणि ज्या वैदिक धर्मानें हिंदुस्थानच्या वैभवाचा पारा एकवेळ अत्युच्च बिन्दूला नेऊन भिडविला होता, त्याच धर्माच्या ऐवजीं आज प्रचलित असलेल्या भिक्षुकी धर्माचा परिणाम आपणांवर कसा काय होत आहे, याचीहि चिकित्सा निस्पृहपणानें केली पाहिजे. असें आपण केलें, तर माझी खात्री आहे की आपला अधःपात व ऱ्हास का झाला याची कारणे पद्धतशीर शोधून काढून त्यावर आपल्याला उपाय करता येणें शक्य आहे.
बांधवहो, मला मार्क अँटनीच्याच शब्दांत आपणांपुढे हा विषय मांडावयाचा आहे. तो म्हणाला, "मी सीझरला मूठमाती द्यायला आलो आहे, त्याची स्तुति करण्याकरितां नव्हे. माणसांची कुकर्मे त्यांच्या मृत्युनंतरहि जिवंत राहतात, त्यांची सत्कृत्ये मात्र त्यांच्या हाडांबरोबरच गाडली जातात." माझी विषयप्रतिपादनाची शैली याच प्रवृत्तीबरहुकूम मी ठेवणार आहे. आत्मस्तुतीला अजिबात फाटा देऊन सत्य गोष्टी मी स्पष्ट बोलून दाखविणार आहे. आमचे वर्तन, स्वभाव, रीतरिवाज, आमचा हलगर्जीपणा आणि राष्ट्रीयदृष्ट्या आमचा परस्पर तुसडेपणा, यांचे उद्धाटण मी स्पष्ट स्पष्ट मोकळ्या मनानें, परंतु किंचित् झणझणीत रीतीने करणार आहे. भूतकालची साम्राज्य-सत्ता हातची गमावून आज आम्हांला ही जी भिकारडी अवनत स्थिती आली आहे, तिची ग्यानोबाची मेख आमच्या नैतिक अधःपातांत आहे हें विसरून चालणार नाही, आमचा भूतकाळ मोठा उज्वल व चिरस्मरणीय असा होता; आमच्या भारतमातेचा अध्यात्मगौरव वृद्धिंगत करण्याच्या कामीं अनेक संत महंतांनी व नृपतींनीं आपल्या कर्तबगारीची पराकाष्ठा केली, या सर्व गोष्टी मला मान्य आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांच्या आदर व प्रशंसेच्या बाबतीत मी कोणासही हार जाणार नाहीं.
आमचे निंदक म्हणतात कीं हिंदुस्थानाला इतिहासच नाही, किंवा इतिहासविषयक बुद्धि कधी आमच्यांत परिणतच झाली नाहीं. पण ही गोष्ट अजिबात खोटी आहे. उठल्यासुटल्या आमच्यावर असला आरोप करणाऱ्या शहाण्यांना आमचा इतिहास अभ्यासण्याइतकी प्रवृत्ती नसते किंवा संशोधनाची अक्कलहि नसते. पुराणांची गोष्ट सोडून द्या. रामायण महाभारत ही आमची राष्ट्रीय महाकाव्यें मूळांतून वाचण्याची कितीकांनी तसदी घेतलेली असतें बरें? आमच्या देशाचा इतिहास व भूगोल, त्याचप्रमाणे प्रसिद्ध प्रसिद्ध राजघराणी व ऋषीकुळे यांच्या वंशांची माहिती पुराणात चांगल्या प्रकारें आढळते. अर्थात प्राचीन भारताचा संपूर्ण इतिहास व भूगोल पुराण ग्रंथांत आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाहीं. तथापि अजून बराच इतिहासाचा भाग उकरून काढावयाचा आहे. त्याचे बरेचसे तुकडे आमच्या धर्मग्रंथांतून व स्मृत्यांतून त्याप्रमाणे चिनी तिबेटी जपानी ब्रम्ही सायामी आणि सिंगाली अशा अनेक भाषांच्या ग्रंथांत इतस्ततः पसरलेलें आहेत. त्यांचें एकीकरण केलें पाहिजे. शोधा म्हणजे मिळेल, या सूत्रानसार आपले प्रयत्न झाले पाहिजेत. परंतु या निंदकांच्या निष्कारण निंदेमुळें तुमचे मायदेशावरील प्रेम विश्वास व शोधक वृत्ति यांचे पाय लटपटूं देण्याचें कांहीहि प्रयोजन नाही.
आमचे आक्षेपक आणखी असे सांगतात की या देशांत अनेक मानववंशाचे समूह रहात असल्यामुळे हिंदुस्थान ही नुसती भौगोलिक संज्ञा आहे. यावर माझा त्यांना जबाब असा आहे की, अहो! तुम्ही आंधळे आहात; तुमचे डोळेच फुटल्यामुळे भेदांतच अभेदाचें वैभव तुम्हांला कसें दिसणार? काश्मीरपासून कामोरीनपर्यंत, जलालाबादपासून चितागांगपर्यंत आणि पलीकडे, कुणीकडेहि पहा सर्वत्र हिंदु संस्कृतीचाच अंमल पसरलेला आहे, ही संस्कृति सध्या जरी अवनत स्थितीत आहे तरी देखील आमच्या अभिमानापुरती ही कांही लहान सहान गोष्ट नव्हे. आजला हिंदुस्थान आणि हिंदुत्व ही दोन्ही संक्रमणावस्थेत आहेत. मध्ययुगांत त्यांच्या अंगावर वाढलेले पापुद्रे आज खळखळ कोसळून पडण्यास सुरवात झाली आहे; आणि आपण स्वतःशी किंवा आपल्या मायदेशाशीं जर प्रतारणेचे पातक करणार नाहीं तर आत्मशुद्धीचा व आत्मोद्धाराचा उषःकाल व्हायला कांहीं वेळ लागणार नाहीं. अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा सर्वत्र अंधार पसरल्यामुळे निरनिराळ्या भेदांचीं पिशाच्चें आज आपणांस भेवडावीत आहेत. परंतु आपण सर्व भारतवासियांनी प्रेमानें व निस्वार्थ बुद्धीनें खांद्याला खांदा भिडवून राष्ट्रकार्याची लगबग केली, तर ज्या शास्त्रीय ज्ञानाची व व्यापक दृष्टीची आपण मार्गप्रतिक्षा करीत आहोत, त्यांना बरोबरच घेऊन उगवणाऱ्या प्रबोधनाच्या सूर्यप्रकाशामुळे त्या भूतांच्या भूतचेष्टा आपोआपच नष्ट होतील.
`जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि` हा उज्वल ध्येयमंत्र आमच्या अन्तःकरणांवर ठसठशीत कोरलेला असतांहि मातृभूमीच्या प्रेमाच्या बाबतीत इतर राष्ट्रांनी आमच्यावर वरचढ करावी काय? हें जर खरे असेल, तो मंत्र आमच्या हृदयांतून साफ पुसून गेला असेल आणि आमच्या मातृभूमिप्रेमांत खरोखरच जर विरजण पडलें असेल तर मग-तर मग काय? झाला, संपूर्ण अध:पातच झाला! या लोकी मोक्ष तर नाहींच, पण परलोकी सुद्धा नाहींच नाहीं!
मला एक दिवस असे स्वप्न पडलें कीं मला कोणी उचलून हिंदभूमातेच्या मांडीवर ठेवले. मी तिच्याकडे पहातों तो तिला मूर्छना येत असलेली दिसली. मी चटकन उवून प्रेमाच्या झटक्याने तिला पाठुंगळी मारली आणि चिंताक्रांत स्थितीत दवाखान्याकडे धावत सुटलों. तेथें बरेच डॉक्टर लोक होते. माझ्या आईला त्यांनी कांहीं उपचार करावा म्हणून मी तिला त्यांच्या समोर टेबलावर हळूच निजविले. ते कांहीं उपचार करणार तोच तिनें एक दीर्घ श्वास सोडला आणि मी जागा झालों. आज आपल्यापुढें मी ठेवीत असलेल्या ह्या निबंधाचे लेखन मी जागा होतांच तत्काळ हाती घेतले.
आपल्या अधःपातासंबंधानें विचार करतांना काही आध्यात्मिक बिनमुर्वत तत्त्वांचा आपणांस अवश्य विचार करणे प्राप्त आहे. या तत्त्वांचे मी दहा विभाग पाडले आहेत.
ते असे :--
(१) `जमका अजब तडाखा` जसा कोणास टाळता येणें शक्य नाहीं. तसें कर्मन्यायाच्या चरकांतून कोणास निसटतां येणें शक्य नाहीं. तुमचा दोष कितीहि क्षुल्लक असो, त्याबद्दल यथातथ्य प्रायश्चित्त द्यायला कर्मन्याय तुम्हांला वाटेल तेथून हुडकून काढील.
(२) जसें पेरावें तसें उगवते.
(३) जसें करावें तसे भरावें.
(४) राष्ट्राचें जीवित असो किंवा व्यक्तीचें जीवित असो, त्याला अचेतन अशी स्थिरावस्था प्राप्त झाली की त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय रहात नाहीं.
(५) सत्य नीति आणि न्याय मिळून धर्म होतो. या धर्मावरच मानवी समाजाचें धारण होत असतें.
(६) ढोंगीपणाच्या दंभोक्तीची सूत्रें अनीतिमत्तेची फार वेळ तरफदारी करू शकत नाहीत. किंवा नीतिमत्तेचें पांघरललें सोंग या सूत्रांना फार वेळ झेपतहि नाहीं. (धर्माच्या नांवावर रचलेली दांभिक सूत्रें नीतिमत्तेचे समर्थन करूं शकत नाहीत.)
(७) धर्मपालनाच्या भरती ओहोटीप्रमाणे राष्ट्रांचे व साम्राज्याचे अस्तोदय होत असतात.
(८) या जगांत केलेल्या पातकाच्या प्रायश्चित्तापासून सवलतीची सूट मिळविलेले एकहि राज्य, राष्ट्र, जात अथवा व्यक्ति सांपडणे मुष्कीलीचें आहे.
(९) काळाचें चक्र हळूहळू फिरतें; कोठच्या दिशेनें वारा येऊन त्याला केव्हां कशी गति मिळेल त्याची कोणाला दाद नसतें, परंतु त्याची घरटी एकदा फिरू लागली कीं तींत सांपडेल त्याचे मात्र वस्त्रगाळ पीठ पड़तें.
(१०) घराचे वासे एकमेकांशी आडवे तिडवे वागूं लागले की त्या घराचा डोलारा जमीनदोस्त झालाच समजावें.
आतांपर्यंत नमनालाच घडाभर तेल जळल्यामुळें वाचकांना कंटाळा आला असेल. परंतु मूळ विषयाची इतकी प्रस्तावना करणें भागच असल्यामुळे वाचकानीं या लांबलचक उपोद्धाताबद्दल मला क्षमा करावी. यापुढें होता होईल तों मी माझें विषयनिरूपण ऐतिहासिक कालक्रमानुसार रेखाटण्याचा निश्चय केला आहे.
एखाद्या वाहत्या झऱ्याचें पाणी जर गढूळ झाले तर खालपासून आपण तपास काढीत काढीत त्याच्या उगमाकडे जातो. पण प्रस्तुतच्या बाबतीत हा नेहमीचा क्रम आपण जरा उलट करूं आणि एकदमच थेट उगमापाशी किंवा जेथपर्यंतचा प्रदेश आपल्या आटोक्यांत आला आहे तेथपर्यंत जाऊन एकंदर स्थितीची पाहणी करू.
तर मग आता प्रथम अगदी प्राचीन वेदकालाकडे नजर फिरवून तेथे या सर्व परंपरेचे कांही विषबीज सांपडते की काय, हें एकदा नीट पाहूं या. या निबंधांतील विचारसरणीकरितां आपण श्री. टिळक यांनी आपल्या Aretic Home in the Vedas या विद्वत्ताप्रचुर ग्रंथात प्रतिपादल्याप्रमाणें आर्यांचे मूल वसतीस्थान उत्तर ध्रुवाकडील युरोपएशियन किंवा युरेशियन भागाकडे होते असेच गृहित धरूं. त्याचप्रमाणें इ.स.पू. ७००० वर्षे ही त्यांत दिलेली वेदकालमर्यादाहि आपण मान्य करू.
कोणत्या का कारणानें होईना, पण ही उत्तरध्रुवाकडील आर्यांची वसाहत विस्कळीत झाली आणि तेथून टोळ्यांमागून टोळ्या नवीन नवीन प्रदेश धुंडण्याकरितां व तेथे नवीन वसाहती स्थापन करण्याकरिता दक्षिण, ईशान्य व नैर्ऋत्य या दिशांकडे उतरूं लागल्या.
मृगशीर्ष (Orion) या तारकापुंजाला विद्वानांच्या मतें, त्या काळी अत्यंत महत्त्व असले पाहिजे, व म्हणूनच ही फाटाफूट होण्यापूर्वी किंवा कदाचित त्याच वेळीहि असेल, या तारकापुंजांतील वैशिष्ट्यदर्शक चिन्हें जीं कमरपट्टा आणि बाण ती आर्यजातीची एक विशिष्ट खूण किंवा एक प्रकारचा शुभदायी ताईत म्हणून त्यांनी अंगिकारिलीं असावी.
आर्यवंशांतील या प्रवासी टोळ्यांनीं या मेखलेचे जानव्यांत आणि बाणाचे हातांत धरण्याच्या दंडांत रूपांतर केलें. हाच आमच्या उपनयन किंवा पैताविधीचा उगम होय.
जे जन्मतः ब्राम्हण, क्षत्रिय किंवा वैश्य असतील त्यांच्या मध्येंच हा उपनयनाचा संस्कार रूढ आहे. हें सर्वांना माहीत आहेच. हिंदुस्थानांतील भिक्षुकशाही ज्यावर उभारलेली आहे त्याचा हा एक मोठा आधारस्तंभ आहे. म्हणून याकडे आपणाला दुर्लक्ष करून चालणार नाही.
या उपनयनविधीचा कसा उपयोग करून घेण्यांत आला आहे हे लवकरच आपल्या निदर्शनास मी आणणार आहे. पण तत्पूर्वी एक गोष्ट मला स्पष्टपणे सांगितली पाहिजे. ती ही की, आज या देशांत ब्राम्हणधर्म या नावांखाली धिंगाणा घालणाऱ्या, परंपरागत चालत आलेल्या व त्यामुळेच तुम्हाला अत्यंत पूज्य वाटणाऱ्या बिनकाळजाच्या `भिक्षुकशाही` संस्थेला या निबंधांत मी चांगलाच तडाखा देण्याचा प्रयत्न करणार आहे.
कमरेचा कमरपट्टा आणि हातांत दंड, ही उपनयन विधीची मुख्य चिन्हें, एट्रस्कन रोमन इजिपशियन क्रीटन ग्रीक इत्यादि प्राचीन लोकांतहि दिसून येतात, ही विचारांत घेण्यासारखी गोष्ट आहे. या लोकांच्या निरनिराळ्या ठिकाणी वसाहती वसल्या. हवा पाणी, अर्थोत्पादनाची साधने, प्रतिकारार्थ शत्रूंशीं करावे लागलेले झगडे, या सर्व भानगडींना तोंड देऊन त्यांनी आपली निरनिराळी राज्यें उभारली. राज्यें अस्तित्त्वात आली की महत्वाकांक्षेचे क्षेत्र विशाळ झालेच. यच्चावत् नागरीक व्यक्तीला लष्करी आटारेट्याचा खणखणाट आणि सांपत्तिक वैभवार्थ उलाढालींचा धडपडाट याशिवाय दुसरी बात माहिती नाहीशी झाली. अर्थात्, या गोष्टींपुढे भिक्षुकशाहीप्रणित विकृत धार्मिक कल्पना, भरंसाट पारलौकीक आकांक्षा, कसली तरी जपजाप्यें व चिंतनें, विधिकर्मे, हीं माजी पडून गतीला लागली.
प्राचीन असिरियन व बॅबिलोनियन, त्याचप्रमाणें सध्यांच्या पारशी लोकांचे पूर्वज, यांच्यामध्ये ही उपनयनाची चाल होती; आणि पारशी समाजांत ती अजूनहि चालू आहे. हिब्रूंच्याहि धार्मिक विधींत तिचा अंतर्भाव झालेला होता. या पारशी आणि हिब्रू समाजांत हिंदुंच्यापेक्षाहि भिक्षुकशाहीचे प्रस्त फार माजले होते; आणि त्याचमुळें शेवटीं त्यांची फाटाफूट होऊन त्यांची सामाजिक संघटना उध्वस्त झाली.
उत्तर ध्रुवाकडील हिमाच्छादित प्रदेशांत सहा महिनें रात्र आणि सहा महिनें दिवस असतो, हें सर्वांना माहीतच आहे. तेव्हां अशा ठिकाणी राहणाऱ्या आपल्या आर्य पूर्वजांना सहा सहा महिन्याच्या गुडूप अंधःकारानंतर प्राप्त होणारा सूर्याचा पहिला किरण, सर्वत्र पसरलेल्या अंधःकाराचा थोडासा तरी भेद करणारा आकाशांतील तारकांचा लुकलुकता प्रकाश, एवढेंच काय पण, कृत्रिम रीतीनें निर्माण केलेला अग्निज्वालेचा प्रकाशमय स्फुल्लिंग हा सुद्धां मोठा आनंदाचा शुभ प्रसंगच वाटावा, यांत कांहीं आश्चर्य नाही.
सर्वत्र पसरलेल्या घनदाट अंधःकाराची, त्याचप्रमाणे भयंकर रोगराईच्या साथींची भीती, म्हणजे जवळ जवळ मृत्यूचीच धास्ती. या धास्तीमुळेच प्रकाशाचा एकच किरण म्हणजे उत्तर ध्रुवस्थ आर्यांना आनंदाची पर्वणी वाटे. या धास्तीच्या आणि आनंदाच्या संमिश्र भावनांतूनच आमच्या धर्मकल्पनांची उत्पत्ति झालेली आहे.
थंडीच्या भयंकर कडाक्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना आरोग्याचे नियम धाब्यावर बसवून अत्यंत गचडीने रहाणे भाग पडत असे. असल्या मेंढरी गचडागचडी पद्धतीच्या टोळ्या करून राहिल्यामुळें अर्थातच वैषयिक निर्बंध व नीति त्यांच्यांत यथा तथाच राहिली. आरोग्यनियमांचे उल्लंघन आणि स्त्रीपुरुष-संबंधांतील शिथिलता यांचा यथाप्राप्त परिणाम म्हणजे महारोग आणि उपदेश यांचा त्या समाजांत जारीनें फैलाव झाला.
उष्णता आणि मांस-विशेषतः गोमांस आणि सोमरस यांची त्यांना दररोजच्या जीवनाकरितां अत्यंत आवश्यकता होती. प्रत्येक ऋतु बदलण्याचे वेळी, जे त्यांचे सार्वजनिक स्वरूपाचे उत्सव व मेजवानीचें प्रसंग किंवा यज्ञ दिवसांचे दिवस चालत असतं, तेव्हां तर या खाद्यपेयांचा समारंभ फारच थाटाने होत असे. थंडीचा कडाका टाळण्यासाठी आणि मारलेल्या पशूंचें मांस भाजण्यासाठी हे यज्ञांतील होमाग्नि एकदां प्रज्वलित झाले की, एकंदर समारंभ पूर्ण आटपेपर्यंत एकसारखे धडधडत असत.
हे सार्वजंनिक उत्सवप्रसंग किंवा यज्ञ ही एक आमच्या आर्य पूर्वजांच्या व्यवहारांतली अत्यंत महत्त्वाची संस्था होती. या प्रसंगी स्त्रीपुरुष एकत्र जमत. यथेच्छ खातपीत, मनसोक्त रीतीनें नृत्य गायन वगैरे क्रीडा करीत, एकमेकांशी शृंगारविलास करीत व अशा अनेकविध आनंदाच्या निमित्तांनी त्या समारंभांत मोठ्या उत्साहाने भाग घेत असत. अर्थातच त्यांच्यामधील वृद्ध मंडळी आपल्या संघाच्या एकंदर स्थितीविषयी, त्याचप्रमाणे बाहेरून कांही संकटे येण्याचा संभव आहे की काय, असल्यास त्यांचें निवारण कसे करता येईल, वगैरे महत्त्वाच्या गोष्टींचा नीट खल करून आपलें पुढील धोरण आंखीत असत. राजनीति आणि पक्षभेद ही मानवी समाजा इतकीच पुरातन आहेत. आणि ज्या अर्थी हे समाज दांडग्या लढवय्या लोकांचे संघ आणि त्यांच्या जिंकलेल्या स्त्रिया यांनीं बनलेले असत, त्या अर्थी असल्या समाजाचे नेतृत्व राजनीतिकुशल आणि रणशूर योध्यांच्याकडेच असे, यांत कांहींच नवल नाही.
असले उत्सव म्हणजे गायक, कवि, मांत्रिक, वैद्य, भविष्यवादी, ज्ञानी, द्रष्टे, तत्त्ववेत्ते, त्याचप्रमाणे ताज्या दमाचे तरुण आणि आपल्या सौंदर्याने मोहनी घालणांऱ्या तरुण स्त्रिया यांना स्फूर्तिदायक आनंदाच्या पर्वण्याच वाटत असल्यास काय आश्चर्य?
असल्या नानाविध चळवळींतूनच वाटेल त्या प्रकारच्या संस्कृति निर्माण झाल्या. यांपैकी हिंदुस्तानांतील संस्कृतीनें कोणतें विशिष्ट वळण घेतलें तें आपण लवकरच पाहू.
या उत्सवांना व्यवस्थित स्वरूप देण्याकरितां त्यानी लवकरच कांही नियम तयार केले. कांही काळानें हेच नियम धार्मिक विधी बनले. त्यांच्यांत होऊन गेलेले मोठमोठे नामांकीत पुढारी `देवता` म्हणून पुजनीय मानले गेले. [`देवता` याचा अर्थ प्रकाशमान, तेजस्वी एवढाच आहे. `देवता` म्हणजे देव परमेश्वर असा मुळींच नव्हे.] त्यावेळीं प्रचारांत असलेली गाणीं, प्रार्थना, आकांक्षा, आशा, त्यांचें सोमपानोत्सव यांचें वर्णन त्यांनी ज्या ऋचांत करून ठेवलें, त्यांच्या संग्रहाला `वेद` ही संज्ञा प्राप्त झाली. वेद हे माणसांनीच लिहून ठेवलेले आहेत. परमेश्वराचा त्यांच्याशी काहीहि संबंध नाहीं.
आतापर्यंत आर्यांमध्ये विवाहसंस्था निर्माण झाली नव्हती; आणि स्त्रियांना कोणत्याहि प्रकारचा दर्जा प्राप्त झालेला नव्हता. ज्याप्रमाणें पुरुषांना उपनयनाच्या विधीनें द्विजत्वाच्या श्रेष्ठ पदवीला जातां येत होतें, त्याप्रमाणें स्त्रियांना कोणत्याहि विधीनें पुरुषांच्या बरोबरीची योग्यता प्राप्त होत नव्हती. स्त्रियांना एकाच संस्काराची मोकळीक होती आणि तो संस्कार म्हणजे स्त्रीपुरुष-संयोग हाच.
प्राचीन काळच्या इंडोआर्यन समाजव्यवस्थेंत स्त्रिया म्हणजे `आव जाव घर तुम्हारा` असल्या दर्जाच्या राष्ट्रीय मालमत्तेच्या वस्तू मानण्याची अधम चाल होती, असें मानण्याला पुष्कळशी जागा आहे. स्त्रीपुरुषांच्या समान योग्यतेचा जो आज मोठा बोलबाला आपण ऐकतो तो सर्व नव्या युगाचा नवा खेळ आहे. प्राचीन काळांत त्याचा मुळींच मागमूस लागत नाही. जंगलांत जाऊन शिकार करावी आणि मारलेली जनावरे शिजवून खाण्यासाठी घरी आणून टाकावी, ही पुरुषांची कामगिरी असे. घरचा विस्तव सारखा पेटलेला ठेवणें, आणलेल्या शिकारीचे अन्न तयार करणे आणि इतर सर्व गृहव्यवस्था ठेवणें, ही कामें पकडून आणलेल्या स्त्रियांकडून चोपून करून घेण्यांत येत असत. मानवी इतिहास म्हणजे एक `झाकली मूठ` आहे. ती उघडून पाहिली तर सारा विद्रुप आणि विलक्षण शेणसडाच दिसायचा. त्याला नटविण्यासाठी वाटेल तितक्या सोन्यानें मढवा किंवा हिऱ्यामोत्यांनी अलंकृत करा. मनुष्याचा पूर्वेतिहास म्हणजे खादाडीकरिता पशूंची शिकार आणि पशूंप्रमाणेच स्वतःची विषयसुखसेवनाची धडपड, यापेक्षां अधिक कांही नाहीं असेंच आढळून येईल. जो अरण्यांत जाऊन जीवावर उदार होऊन पशूंची शिकार करी आणि घरीं मुबलक अन्न आणि पाणी आणी तो अर्थातच घराचा मालक-स्वामी, आणि जे घरी स्वस्थ बसून तें अन्न शिजविण्याची व विस्तव पेटलेला ठेवण्याची वगैरे व्यवस्था करीत ते त्यांचे गुलाम. आमच्या अध:पाताचे मुख्य कारण जी विषारी भिक्षुकशाही तिचा मोठा आधारस्तंभ म्हणजे या गुलाम बनविलेल्या स्त्रिया.
पंडित उमेशचंद्र विद्यारत्न यांच्या सिद्धांताप्रमाणे आपले हे अर्धवट संस्कृतीचे आर्य मंगोलियांत वसाहतीसाठीं उतरले असें आपण धरून चालू. या लोकांनी आपल्या गुलाम बायका उत्तरध्रुवाकडील प्रदेशांतच टाकून दिल्या. अर्थातच मंगोलियांत आल्यानंतर त्यांनी तेथे नवीन स्त्रिया पकडून आणल्या असल्या पाहिजेत व त्यांच्यापासूनच तेथे त्यांचा वंशविस्तार होऊन ते बरेच वर्षे तेथें वसाहत करून राहिले असावे, असें मानण्याला बरीच जागा आहे. कारण, हिंदुस्थानांतील कांहीं चांगल्या चांगल्या उच्च ब्राम्हण कुलांत मंगोलियन रक्ताची झांक अझून स्पष्टपणें दिसून येते.
पंडित उमेशचंद्रांच्या मताप्रमाने हे आर्य लोक नंतर मंगोलियातून इराणकडे वळले. दुर्दैवी इराणांत आर्यांच्या वेदसंस्कृतीच्या प्रगतीबरोबरच पारशांच्या अवेस्ताचीहि वाढ झालेली दृष्टीस पडते. या दोन संस्कृतीत इतके साम्य आहे की, जणुं काय दोन निरनिराळ्या पोषाखांत असलेलीं ही दोन जुळी भावंडेच होत. दोन कुत्री किंवा मांजरे भेटली म्हणजे जशी एकमेकावर गुरगुरून लागलींच भांडायला सुरवात करतात, तसा वैदिक आर्य आणि वेस्तिक आर्य यांचा एकसारखा झगडा चालू होता. गाथा नांवानें प्रसिद्ध असलेले अवेस्ताचे अगदी पहिले प्राचीन भाग आणि वेदाच्या ऋचा यांच्यामध्यें विलक्षण साम्य आहे. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विद्वानांच्या मते झेंदांतील गाथा जर नीट समजून घ्यावयाच्या असतील तर अगोदर त्याकरिता वेदांचे नीट सम्यक ज्ञान असणें अत्यंत अवश्य आहे.
अवेस्ता संघाने आपल्या नामांकीत पूज्य नायकांना (Hero) अहूर असें नाव देऊन त्यांना देवतारूप दिलें. वैदिक आर्यांनी त्यांची टायली करण्यासाठीं अहूरांना असूर असें खोडसाळ नांव दिलें. उलट पक्षीं, झेंदावेस्तावाल्यांनी वैदिक आर्यांच्या देव देवतांना चोर लुटारू असलीं विशेषणें दिली. इराणांत वैदिक आर्य म्हणजे परकी उपटशुंभच आले होते. त्यांचा तेथें टिकाव लागे ना, म्हणून वसाहतीसाठीं त्यांना जवळच्या पंजाब गंगेच्या नवीन प्रदेशाकडे आपला मोर्चा अखेर वळवावा लागला.
इराणांतील हे दोनहि प्रतिस्पर्धी संघ विभूति-पूजेचे विलक्षण कड़वे भोक्ते होते. "हे इंद्रा, वस्तुमात्राच्या अधिराजा, त्या दृष्ट वृत्राचें हनन कर!" हा वैदिक आर्यांचा आक्रोश एका बाजूला सारखा ऐकू येत होता, तर त्याचाच प्रतिध्वनी "हे वृत्रा, विश्वाच्या अधिराजा, देवांच्या नायकाचे, त्या चोर दरोडेखोर इंद्राचें अणुरेणू इतके तुकडे तुकडे करून टाक!" या वेस्तिक आर्यांच्या ओरडण्यात उमटत होता. असले शिवराळ आक्रोश चिळस आणण्याइतके मुबलक आढळतात. वाटेल त्या क्षुल्लक गोष्टीच्या प्राप्तीकरितां वेळी अवेळीं इंद्राची प्रार्थना करण्याच्या धार्मिक संवयीमुळें आर्यवंशाच्या स्वभाव-प्रवृत्तीवर केवढा भ्रष्ट आणि घातुक परिणाम झालेला आहे, हें मला अत्यंत स्पष्टपणे तुमच्या निदर्शनास आणले पाहिजे.
असले हे विलाप, धावे, प्रार्थना, आणि आमच्या प्रकृतिस्वभावात त्यामुळें भिनलेली सूडाची प्रवृत्ती याचा यथाप्राप्त परिणाम आज आमच्या तरुण मुलांत घरीदारी व शाळांत दिसून येणाऱ्या कुत्सित आणि हलक्या कानाच्या प्रवृत्तीत दिसून येतो. चांगले वयांत येऊन उद्योगधंद्याच्या मार्गाला लागले तरी त्यांच्यांतील ही कुत्सितपणाची बुद्धी आणि चहाडखोरपणाची घातुक संवय जात नाहीं. कोणाला काय सांगावे आणि काय सांगू नये ही तारतम्यबुद्धीच कोणांत दिसत नाहीं. या असल्या घाणेरड्या प्रवृत्तीमुळें अतिशय अनर्थ होतात. फार काय पण, कुटुंबांतल्या गुप्त गोष्टी युरपियन वकील किंवा युरपियन डॉक्टर यांना आम्ही जशा बिनधोक सांगूं शकतो, तितका विश्वास कोणत्याहि मोठ्या व पोक्त हिंदु वकीलावर किंवा हिंदु डॉक्टरावर टाकण्याचा आम्हाला धीर होत नाहीं.
स्वभावाच्या या कमकुवतपणामुळें वाह्यात वाचाळपणा येतो. पोटांत कोठलीहि गोष्ट ठरत नाहीं. रिकामटेकड्या आजीबाई प्रमाणें निंदाकुचेष्टांची भरंसाट पैदास करण्याची संवय लागते, आणि शत्रूमित्र भेद न मानतां सर्वांसाठी गटारगप्पा पसरविण्याचे सार्वजनिक अड्डे सर्वत्र निर्माण होतात. आमच्या समाजाला सध्यां जी अधोगति आणि सत्वहीनता प्राप्त झाली आहे तिची हीं उघड उघड लक्षणें आहेत.
****
भाग २
वर सांगितल्याप्रमाणे, इराणांत डाळ न शिजल्यामुळें ही वैदिक आर्यांची टोळी तशीच पुढें पंजाबात सरकली, व गंगेच्या खोऱ्यानें आपली वसाहत वाढविण्याच्या मार्गाला लागली. पण तेथेंहि त्यांना आपला मार्ग निष्कंटक आढळला नाहीं. त्यांच्या पूर्वी तेथें वसाहत करून राहिलेले लोक होतेच. त्या लोकांनीं आर्यांना चांगलीच विरोधाची टक्कर दिली. या जुन्या लोकांची संस्कृति या परकीय वेदशाखेच्या आर्यांच्या संस्कृतिपेक्षा कोणत्याहि प्रकारें हिणकस नव्हती. अर्थातच आपलें बूड प्रस्थापित करण्याकरितां या नवीन मंडळींचे त्यांच्याशी बराच काळापर्यंत निकराचे झगडे, मारामाऱ्या व युद्धे सुरू होती आणि या सतत चाललेल्या झगड्यांत आर्यांना पुष्कळ वेळां सणसणीत माघारहि खावी लागली.
या विरोधी परिस्थितीमुळें नवीन वसाहतवाल्यावर मुळचीच असलेली जबाबदारी प्रचंड पटीने वाढली. ह्या सदैव पुढें उभ्या ठाकलेल्या शत्रूंशी लढाया मारणें, व त्यांच्याशीं युक्तीप्रयुक्तीचे डाव खेळणे हे तर प्राप्तच होतें पण त्याच बरोबर, जिंकलेल्या जमिनीची मशागत व लागवड करणें, चराईच्या कुरणांसाठीं जंगलतोड करणें, घरें बांधणें, बायकां मुलांच्या संरक्षणाची तरतूद ठेवणें, उदरनिर्वाहा करितां व चामड्यांकरितां रानटी जनावरांची शिकार करणें, गुरांढोरांची जोपासना करणें, रांजण भांडी बनविणें, वस्त्रें शिवणें, धनुष्य बाण तयार करणें, नेहमीं लढायांसाठी सज्ज असणें, हजार भानगडीचें आणि खटपटींचे वैदिक यज्ञ होमहवनादि कर्मे यथासांग आचरणें, इत्यादि अनंत कामें त्यांना करावयाची होती.
वसाहती करण्याकरितां आलेले हे लोक स्वावलंबनी, काटक आणि आपल्या चिमुकल्या संघाच्या भवितव्यतेची जबाबदारी पूर्ण ओळखणारे असे होते. काय वाटेल तें होवो, पण ह्या नवीन सांपडलेल्या सुपीक आणि सुसंपन्न हिंदुस्थानचा प्रदेश आपल्या हातातून मुळींच गमवायचा नाही. असा त्यांचा कृतनिश्चय झालेला होता.
पूर्वापार चालत आलेल्या पैत उर्फ उपनयनविधीनें प्रारंभी जरी ते सर्व स्वतःस ब्राम्हण म्हणवीत होते, तरी परिस्थित्यनुसार ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणें त्यांना आपापसांत निरनिराळी शारीरिक व मानसिक कष्टाचीं कामें आपापसांत वाटून घ्यावी लागली.
श्रमविभागाच्या तत्त्वांवर उभारलेल्या या कामांच्या वांटणीमुळें आपल्यांत वैश्य, क्षत्रिय, त्याचप्रमाणें वेद आणि वेदमान्य निरनिराळे धार्मिक विधी, ग्रहताऱ्यांच्या स्थानावरून कालमापन करणें, मंत्रतंत्रविद्या, वैद्यकी, इत्यादि बौद्धिक विषयांचे सम्यक ज्ञान असलेला एक निराळाच वर्ग याप्रमाणें निरनिराळे समाजवर्ग उत्पन्न झाले.
या शेवटल्या बुद्धिजीवी वर्गामधूनच ज्ञानी, ऋषी इत्यादि समाजाचे पुढारी उत्पन्न झाले. अशा रीतीनें समाज बनूं लागतांच त्याच्या नियंत्रणासाठीं, राज्यकारभाराचे धोरण कोणत्या प्रकारे ठेवावें किंवा विशिष्ठ प्रसंगी कोणता मुत्सद्दी डाव खेळावा, वगैरे राजकारणी जबाबदारीहि त्यांच्यावरच पडली. ज्याप्रमाणें धार्मिक विधीचा अर्थ लावणें, त्यांना नियमबद्धता आणणें हा अधिकार त्यांचा, त्याचप्रमाणें देशाचें कायदे करणें आणि त्या कायद्यांचा योग्य अर्थ करून त्यांची बजावणी करणें हाहि अधिकार त्यांनींच आपल्या हातांत घेतला.
याच वर्गामधून ब्राम्हण जातीचा उदय झाला आहे. सर्वांना पूज्य वाटणाऱ्या या खास जातीनें पूर्वीच्या वर्गाचे नांव कायम ठेवून धर्म आणि राजकारण या दोहोंचीहि सूत्रें आपल्याच हातांत ठेवली. त्यांच्या दृष्टीनें राजकारण म्हणजे धर्मनियंत्रणसत्तेचीच पुरवणी म्हणून समजली जात असे. अर्थातच इतर सर्व वर्गाचे गुरून किंवा धार्मिक नेते म्हणून ज्यांचे स्थान आजतागायत या समाजांत चालत आलें आहे. त्या लोकांचा `उपाध्याय` किंवा `भिक्षुक ब्राम्हणवर्ग` म्हणून निर्देश केल्यास त्यांत कांही वावगें नाहीं.
वेदशाखीय आर्यांचे हिंदुस्थानांत पाऊल पडण्यापूर्वी जे लोक तेथें होते त्यांना आपण द्रविड-नाग या नांवानें संबोधू. प्रस्तुत निबंधाच्या सोईकरितां द्रविड आणि नाग या दोन जातींच्या नामसमुच्चयानें बनविलेल्या या नांवामध्यें असुर, गंधर्व, राक्षस, दैत्य, दानव, पिशाच्च, भूत वगैरें निरनिराळी नांवें आर्यांनी दिलेल्या सर्व वर्गांचा मी समावेश केलेला आहे. हे सर्व वर्ग वसाहतीच्या प्रवृत्तीपेक्षां युद्धकलेंत आर्यांपेक्षा केव्हांहि अधिक निष्णात आणि बलवान होते.
हे द्रविडनाग अगदींच सरळ, प्रामाणिक, उदार, अतिथींचा मोठ्या प्रेमानें सत्कार करणारे, छक्केपंजे न जाणणारे आणि चटकन् फसले जाणारे असले भाबडे आहेत, हें त्यांच्या शत्रूंच्या लवकरच ध्यानांत आले. अशा भोळसट आणि उदार प्रतिस्पर्धांच्या मनांतील आपल्याविषयींचा वैरभाव काढून टाकून त्यांच्याकडून तहनामें, सवलती, वगैरेंच्या रूपाने बरेंचसे हक्क प्राप्त करून घेणें हें मुत्सद्देगिरींत मुरलेल्या लबाड ब्राम्हणवर्गाला अगदींच सहजसाध्य झालें.
अगदी प्राचीनकालापासून या पुरोहितशाहीचा उर्फ भिक्षुकशाहीचा वरचढपणा कसा प्रस्थापित झाला, हें तुमच्या आता लक्षांत आलें असेल. ते कधीं राजे झाले नाहींत किंवा राजपद घेण्याची त्यांनी इच्छा केली नाहीं. परंतु राजाचे सल्लागार राजमंत्री म्हणून मात्र सर्व सत्ता आपल्याच हातांत ठेवण्याचा त्यांचा नेहेमींचा कावा होता. एवढेंच नव्हे तर प्रसंगी नवीन नवीन राजे निर्माण करण्याकडेहि आपल्या सत्तेचा ते उपयोग करीत असत. राजांच्या गैरहजेरीची सवलत मिळून, राज्यकारभार आपणांस हवा तसा हाकण्यास मिळावा, म्हणून खुद्द राजांना राणीवशांत राजपत्न्या आणि नाटकशाळांच्या शृंगारविलासांत हवे तितके दिवस, कधीं कधीं वर्षांनुवर्षे सुद्धां, रमण्याची सवलत हे धर्मगुरू खुशाल देत असत.
या ब्राम्हण भिक्षुकांच्या वर्गानें ज्ञान संपादण्याच्या आणि सृष्टीचें ज्ञानभांडार ज्या ज्या मार्गानें खुलें होईल ते ते मार्ग शोधून काढण्याच्या कार्याला अत्यंत निःस्वार्थबुद्धीनं आणि अकृत्रिम उत्साहाने पूर्णपणे वाहून घेतले. उग्र आणि दुस्तर योगसाधनांचा अबलंब करून, वर्षानुवर्षे निरनिराळे अवघड सिद्धींचे प्रयोग करून, ज्ञात व अज्ञात सृष्टींचे नियम संशोधन करून आपल्या सुप्त शक्ती कोणत्या प्रकारें जागृत करता येतील, यांचा त्यांनी अभ्यास चालविला. अशा रीतीनें बौद्धिक सामर्थ्यांत इतर मानवापेक्षां आपण सर्वांत श्रेष्ठ किंवा एक प्रकारें आधिदैविक गुणानीं संपन्न आहोत, अशी इतरेजनांवर त्यांनी छाप बसविली. अर्थातच सर्वांनी यांना प्रत्यक्ष देव मानून, यांच्या पायावर धडाधड लोटांगणे घालावी, अशी इतर लोकांची समजूत होऊन बसली.
पृथ्वीवर सम्राट काय किंवा एकंदर साधारण जनता काय, या दोघांचेहि आपणांवाचून अडलें पाहिजे, इतकें त्यानी आपले प्रस्त समाजात वाढविलें. समाजव्यवस्थेची अखिल रचनाच जणुं काय या भिक्षुकशाहीच्या मिजासखोर लहरीवरच अवलंबून राहिली पाहिजे, अशी स्थिती प्राप्त झाली. राजे लोक मोठमोठी युद्धें करीत; कां? तर त्यांच्या भिक्षुक मंत्र्यांची इच्छा म्हणून शत्रूंना जिंकून त्यांचे देशचे देश उध्वस्त करीत; कां? तर तेथें भिक्षुकवर्गाला आणि भिक्षुकशाहीच्या पुरस्कर्त्यांना हातपाय पसरण्याला वसाहतीची जागा हवी म्हणून. युद्ध संपल्यानंतर दोन्ही पक्षांच्या तहनाम्याच्या अटी ठरविण्याचा अधिकार यांचाच.
एवंच पूर्वीपासून सगळ्याच बाबींत आपण विशेष हक्कदार असल्या विशिष्ट अधिकाराचें अत्यंत उच्च स्थान या भिक्षुकानीं समाजात प्राप्त करून घेतलें. हळूहळू ही द्रविडनाग राज्यें भिक्षुकशाहीच्या वजन व सत्तेच्या कारवाईला बळी पडत चालली. नागरीक संघ नात्यानें त्यांचे स्वातंत्र्य जरी कायम होतें, तरी एकंदरीनें भिक्षुकशाहीचा पगडा त्यांच्यावर जबरदस्त बसला होता. जातीभेदसंस्थेचा त्यांनी आपल्या समाजरचनेत अंगिकार केला. उपनयनविधी आणि होमाग्नीच्या द्वारे यज्ञपूजा वगैरे ब्राम्हणी धर्मविधीचाहि त्यांनी स्वीकार केला. मात्र या धार्मिक विधींचे कर्तृत्व व नेतृत्व बिनशर्त भिक्षुकांच्याच हातीं ठेवलें. लवकरच सोमरस काढण्याच्या आणि पिण्याच्या कलेंत द्रविडनाग तरबेज झाले. थोडक्यात सांगावयाचें म्हणजे वेदशाखीय आर्यसमाजाच्या शरीरावर हें एक कलमच बांधण्यात आलें. आर्य हे सुंदर, उंच, भव्य, मजबूत बांध्याचे गौरवर्णाचे, कांतीमान् असून त्याची शरीररचना रेखीव होती. साहजिकच द्रविडनाग जातीच्या काळ्यासावळ्या कुमारिकांच्या चित्ताला त्यांनी भुरळ पाडली असल्यास काय नवल?
वेदानुयायी आर्य आणि ब्राम्हणधर्मीय बनलेल्या या द्रविडनाग जाती, त्याचप्रमाणें ह्यांची संतती आणि भिक्षुकशाहीच्या अंमलाखाली अजून न आलेल्या शुद्ध अनार्य जाती यांच्या सर्रास मिसलींने आपल्यामध्ये आठ प्रकारचे विवाहविधी उत्पन्न झाले.
परिस्थितीच अशी झाली होती कीं, स्वतःच्या स्वास्थ्यसंरक्षणाकरिता आर्यांना परस्पर बेटीव्यवहाराच्या द्वारे द्रविडनागांशी असले विवाहसंबंध जुळवून आणणेंच जरूर पडले. या दोन समाजाची अशा रीतीने देवाण घेवाण सुरू होऊन एकमेकांची घसट सुरूं झाल्यावर ब्राम्हणांनाहि द्रविडनागांच्या विद्रूप आणि ओबडधोबड देवतांना आपल्या देव्हाऱ्यांत स्वतःच्या वैदिक देवतांच्या शेजारी स्थान द्यावें लागलें. परिस्थितीनें घडवून आणलेला हा समेट होता. अशा रीतीने आर्यांना आपल्या पूर्वीच्या शुद्ध वैदिक वळणापासून जबरदस्तीने बाजूला सरणें भाग पडलें.
आर्य आणि अनार्य या दोन्ही वर्णांतील खालच्या वर्गांची एकमेकांशी सरसहा भेसळ होऊन त्यापासून शूद्राचा नवीन वर्ग उत्पन्न झाला. त्यांच्या रक्तमिश्रणाच्या गुणधर्माप्रमाणें आणि त्याच्या कार्यक्षमतेच्या स्वरूपाप्रमाणे त्यांच्यामध्येहि निरनिराळे थर पडले. अशा रीतीनें त्यावेळचे श्रम विभागाचे (लेबर प्रॉब्लेम्स) बरेचसे प्रश्न सुटले.
शूद्र आणि ब्राम्हण यांच्या विवाहासंबंधाविषयी मनुस्मृतीमध्ये कांही ठिकाणीं सांपडत असलेला निर्बंध आणि कांहीं इतर ठिकाणीं असल्या विवाहाची फक्त ब्राम्हणालाच त्यानें दिलेली मोकळीक, ह्या गोष्टी वरून असें स्पष्ट दिसतें की, मनूच्यापूर्वी ब्राम्हण लोक शूद्र स्त्रियांबरोबर राजरोसपणें स्वैर संबंध ठेवीत असले पाहिजेत.
रामायण आणि महाभारत या महाकाव्यांचे नीट चिकित्सक परिशीलन करा, म्हणजे त्या वेळच्या समाजाचें स्पष्ट चित्र तुमच्या समोर उभें राहील. भिक्षुकशाहीच्या अंमलाखालील त्या समाजांत अनिर्वेध स्वेच्छाचार आणि आठ प्रकारच्या विवाहपद्धतीच्या योगें वाटेल तितक्या स्त्रिया करण्याची रीत यांच्या द्वारें समाजाची वाढ होत चाललेली तुम्हास दिसेल. त्याचप्रमाणें, त्यावेळच्या क्षत्रियांनी लढलेल्या मोठमोठ्या लढाया आणि त्यांची धैर्याची आणि धाडसाचीं अद्वितीय शूर कृत्ये यांच्या मुळांशीं तुम्हाला एकच गोष्ट दिसून येईल कीं, या सर्व शूरधीर कृत्यांच्या पाठीमागें, क्षत्रिय सत्तेला किंवा राजसत्तेला वाटेल तशी नाचविणारी शक्ती ही भिक्षुकशाहीच होय.
प्राचीन हिंदुस्थानचा इतिहास ब्राम्हणवर्गानेंच घडवून आणला आहे यांत तिळमात्र संदेह नाहीं. त्या वेळचा ब्राम्हणवर्ग खरोखरीच थोर होता. कारण कसाहि वारा येवो. कितीहि भयंकर वादळ होवो, धीर खचूं न देतां, आर्यसमाजाचें तारूं कुशल नाविकाप्रमाणें त्यांतून सुरक्षितपणें कसें हांकारावें हें फक्त त्यालाच माहीत होते.
समाजाच्या नेतृत्वपदासाठी क्षत्रिय आणि ब्राम्हण यांच्यामध्यें पुष्कळ वेळा झगडे झाले. या प्रत्येक झगड्यांत क्षत्रियांपेक्षां ब्राम्हणानींच यश संपादन केलें. आपण प्रत्येक बाबतींत, क्षत्रियोचित शस्त्रधारणेच्या बाबतींतसुद्धां, निःसंदेह श्रेष्ठ आहोत हे त्यांनी सर्वांच्या निदर्शनास आणून दिले. अशाच एका झगड्यांत क्षत्रियांना नामोहरम करून त्यांना सफाई नष्ट करण्याच्या हेतूनें ब्राम्हण परशुरामानें एकवीस वेळां क्षत्रियांचा भयंकर पराभव करून जवळ जवळ त्यांची सत्ता नामशेष केली होती. पण क्षत्रियांच्या नाशाबरोबरच परशुरामानें ब्राम्हणांच्या नाशाचाहि खड्डा तयार केला. यांत मुळीच शंका नाही.
क्षत्रियांची सत्ता अशा रीतीनें एकदम रसातळास गेल्यामुळे समाजव्यवस्थेचा सर्व तोल नाहींसा झाला. ब्राम्हणाला कह्यांत ठेवील किंवा त्याला विरोध करील असा कोणीहि बरोबरीचा उरला नाही. त्यामुळे तो वर्ग अधिकारमदानें बेताल आणि धुंद झाला. त्याच्या ठायी. असलेल्या सद्गुणांचा लोप होऊन तो चैनी, विषयासक्त, दुराचारी आणि अधम झाला. अर्थातच त्याचा यथागत परिणाम म्हणजे त्याचा अध:पात झाला. त्याच्या अध:पतनाबरोबरच त्याने उभारलेल्या प्राचीन हिंदु समाजाचा मनोराहि गडगडून कोसळला. समाजाचा नेता आणि धर्मगुरू ब्राम्हण याचा अधःपात म्हणजेच त्या अखिल हिंदु समाजाचा अधःपात होता. मी त्याच अधःपाताचे चित्र कोणताहि आडपडदा न ठेवतां आपल्यापुढे स्पष्टपणे रंगवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
पण त्याचबरोबर एक दोन गोष्टी नाकबूल करून चालणार नाहींत. समग्र हिंदुस्थान जो आर्यांच्या ताब्यांत आला तो ब्राम्हण वर्गानेच आपल्या राजकारणी डावपेचांनीं व मंत्रतंत्रादि धार्मिक अवडंबराच्या भुल भुलावणीनें आणला व एकदां तो आपलासा केल्यावर त्यावर आपल्या जुन्या पुराण्या भिक्षुकशाहीच्या संस्कृतीची जबरदस्त छाप बसविली. ही संस्कृति व तिच्यावर उभारलेली समाजघटना शतकानुशतकें सर्व प्रकारच्या परिस्थितीतून बौद्ध आणि इस्लामी धर्म ह्यांच्या जबरदस्त घाल्यांनाहि न जुमानतां, कशीबशी दुर्बल स्थितींतच का होईना, पण आजतागायत तगविली.
त्याचप्रमाणें आज ब्रिटीश अमदानींत, लोकांच्या सामाजिक किंवा धार्मिक आचारविचारांत ढवळाढवळ किंवा जुलूम जबरदस्ती करावयाची नाहीं, या राजकर्त्यांच्या उदार आणि विवेकी धोरणामुळें, आपली सत्ता पुन्हां सांवरून दृढ करण्यास या भिक्षुकांना चांगलीच संधी मिळाली, हीहि गोष्ट प्रत्येकाला कबूल केली पाहिजे. व्यक्तीच्या विशिष्ट धर्मभावनांना धोका पोहचण्याची मुळींच भीती नाहीं व आचारविचारांच्या बाबतींतहि दुसऱ्यांकडून उपसर्ग होणें शक्य नाही. अशी नामी संधी पाहतांच भिक्षुकशाहीला अर्थांतच मूठभर मांस चढल्यासारखें होऊन, आपल्या जुन्यापुराण्या सामाजिक वर्चस्वाचा अंमल अखिल हिंदु समाजावर गाजविण्याची त्यांनी जबरदस्त खटपट चालविली.
सध्या आमच्या देशांत कायदा आणि शिस्त राखण्याची जबाबदारी ब्रिटीश सरकारने पत्करली आहे. तो मामला आतां भिक्षुकशाहीकडे राहिलेला नाहीं. पण प्राचीन काळापासून, आमच्या धार्मिक, सामाजिक, नैतिक, आत्मिक किंवा बौद्धिक संरक्षणाचा प्रश्न जर ब्राम्हण पुरोहित आणि धर्मांच्या सबबीखालीं उभारलेली त्यांची अधार्मिक भिक्षुकशाही यांच्याच हाती आहे, आणि त्या बाबतीत जर आमचा अधःपात झाला असेल, तर हिंदुस्थानांतल्या प्रत्येक हिंदुने त्याबद्दल भिक्षुकशाहीला खडखडीत जाब विचारला पाहिजे. आमच्या सर्व श्रेयाची ठेवच जर त्यांनी सांभाळली होती, तर तिच्या बऱ्या वाईटाचा सर्व हिशोब भिक्षुकशाहीला आतां बिनचूक दिलाच पाहिजे.
ऋग्वेद, यजुर्वेद आणि शतपथ ब्राम्हण यांमध्ये अखिल ब्रम्हांडाचा अधिराज सर्वशक्तिमान असा एकच परमेश्वर आहे अशा भावनेने गाईलेली किती तरी गंभीर आणि उदात्त कवनें सांपडतात. पण हें उदात्त तत्व आपल्यापुरतेच गुप्त ठेवून, समाजाच्या मनावर भिक्षुकशाहीचें वर्चस्व कायम राखण्याच्या हेतूने, जसा भक्ताचा भाव तसा त्याचा देव या निमित्तानें, शेंकडों देव आणि देवता निर्माण केल्या. ह्या देवदेवतांच्या नानाविध कथांनी ही भोळसट कुळें चांगलीच भारली गेलीं. मग काय? भिक्षुकशाही आणि त्यांचे जातभाई यांना मोकाट चरण्याकरता सर्व रान मोकळें झालें. जितके देव तितक्या पूजा. पूजा म्हटली की ब्राम्हणाला मोठमोठ्या दक्षिणा दिल्याच पाहिजेत. त्याशिवाय, या देवा॑च्या नांवानें मधून मधून जातीची व त्याबरोबर ब्राम्हणांचीही भोजनें घातली पाहिजेत. त्याशिवाय इहपरलोकाच्या शाश्वत सुखाची संपादणी कशी होणार? असल्या शिकवणीमुळें भक्तांच्या पिशविचें तोंड चांगलेंच मोकळें झाले आणि त्यांतला सारा ओघ ब्राम्हणांच्या घरादारांकडे वळला. पुष्कळशा देवदेवता असल्या म्हणून बिघडले कुठें? बरोबर आहे! भक्ती ही काय? एकनिष्ठपणे कोणत्याहि देवतेची केली तरी फलप्राप्ती एकच. कारण भिक्षुकशाहीचें एक जाडें तत्त्व आहेना कीं, उपासना कोठल्याहीं मार्गानें केली तरी शेवटी ती एकाच परम ईश्वराकडे पोहोचणार!
मी पूर्वी सांगितलेंच आहे कीं, वेदांमध्ये `देवता` हा शब्द `ईश्वर` या अर्थाने मुळींच वापरलेला नाहीं. जुने आग्रही शास्त्री पंडित आणि परकीय युरपियन विद्वान यांनीं त्याचा तसा चुकीने अर्थ लावला आहे. निरुक्तामध्यें (७-१५) `देवता` शब्दाची अगदी स्पष्ट व्याख्या केली आहे. "जें जें काहीं आपल्या सुखाची अभिवृद्धि करण्यास समर्थ आहे, जें चराचर वस्तुमात्राला प्रकाशित करूं शकतें, किंवा वस्तुमात्राचें ज्ञान ज्यामुळेंच मिळणें शक्य आहे, त्याचप्रमाणें सर्व तेजाचें तेच ज्यांत सांठविलें आहे, अशा प्रत्येक गोष्टीला देवता हें अभिधान देण्यास हरकत नाहीं." या व्याख्येवरून `देवता` हा शब्द कोणत्या अर्थाने वापरीत असत याचा नीट उलगडा होईल.
भिक्षुकशाहीनें आपल्या संस्कृतीचा प्रसार करतांना कमी प्रतिकाराच्या प्रसंगाचे धोरण स्वीकारलें होतें. स्वतःचा हेतु साधण्यासाठी त्यांनी आपल्या पूज्य वेदांची सुद्धा पर्वा केली नाहीं. एका परम ईश्वराच्या भक्तीचें उदात्त ध्येय पायांखालीं तुडवून, शेकडों देव देवतांच्या उपासनेचा प्रसार करण्यांत ब्राम्हण वर्गानें, समाजाचा आध्यात्मिक गुरू या नात्याची आपली जबाबदारी ओळखली नाहीं व समाजाचा त्या बाबतींत त्यानें अगदीं विश्वासघात केला, असेंच म्हणणे भाग आहे.
यामुळें खरें तत्त्व बाजूला राहून त्याच्या भोंवतीं निरनिराळ्या पोकळ नांवांचे आणि कोरड्या विधींचे जाड कवच पडले. बहुजनसमाज या वरच्या आंगतुक आवरणालाच संतत्व म्हणून कवटाळूं लागला. नाना मतांचे आणि नाना तऱ्हेचे पंथ त्यांच्यामधें भराभर उत्पन्न होऊं लागले. स्वतःच्या संस्कृतीचा आणि सत्तेचा विस्तार करण्याच्या लालसेनें ब्राम्हण वर्गाने धर्माचे गांभीर्य मात्र गमावलें. सत्ता, इभ्रत आणि संपत्ति यांच्याकरिता आपल्या सदसद्विवेक बुद्धीचा त्यानें भर चव्हाट्यावर लिलांव केला आणि त्यांचे अनुयायी भक्तजन ज्या भिकार अभिरुचीच्या खातेऱ्यांत लोळत होते त्याच नैतिक अधःपाताचे त्यानें कुंटणखाने उघडले.
सर्व समाज मानसिक गुलामगिरींत जखडल्यामुळें चोहींकडून भिक्षुकशाहीचीं स्तुतिस्तोत्रें झडूं लागली. समाजांतील सर्व प्रकारचे लोक त्यांच्या पदारविंदी लोटांगणे घालू लागलें. इतर तऱ्हेनेंहि त्यांना शेकड़ों प्रकारच्या विशेष सवलती व अधिकार प्राप्त झाले. मनुस्मृतीसारख्या कायद्यांनी त्यांना शिक्षेची भीती ठेवली नाहीं. अशी वाटेल तशी बेजबाबदार सत्ता त्यांच्या हातांत सामावली होती. फाजील मान सन्मान आणि फाजील सत्ता यांमुळे हिंदुस्थानच्या धर्माचे हे अधिराज ब्राम्हणदेव भ्रष्ट झाले. नागडा स्वार्थ आणि बेहोष चैनबाजी यांनी ते धुंद होऊन गेले.
आपल्या सत्तेचा त्यांनी वाटेल तसा प्रसार केला. पण ज्या नानाविध वर्गांशी त्यांचा संबंध आला किंवा ज्यांना त्यांनी आपल्या कह्यांत आणले त्यांची संस्कृति कोणत्या दर्जाची आहे, याची त्यांनी मुळींच फिकीर केली नाही. किंवा जीमुळे त्यांच्यामध्यें कांही तरी एकजिनसीपणा येईल, किंवा ते चांगले सुशिक्षित होऊन सर्व तऱ्हेनें त्यांचा विकास होईल, अशा तऱ्हेच्या संस्कृतींची त्यांनी अपेक्षाहि केली नाहीं. नवीन नवीन प्रदेश आणि नवीन नवीन समाज आपल्या सत्तेखाली येत आहेत; मग नसता व्याप आणि चिकित्सा करावयाला सांगितली कोणी? इतकी त्यांची दृष्टी सकुंचित आणि सत्तामोहानें आंधळी झाली होती.
स्वतःची सत्ता अबाधित रहावी, तिचा कोणत्याही तऱ्हेने भंग होऊ नये म्हणून त्यांनी `फोडा आणि झोडा` या मुत्सद्दी तत्त्वानुसार समाजाचे निरनिराळे वर्ग पाडले. शतकानुशतकांच्या लोकांच्या अज्ञानामुळें हेच भेद जुन्या पुराण्या हाडांप्रमाणे निर्जीव आणि अभेद्य बनले. आपणा व्यतिरिक्त सर्व समाज असा वेगळा व स्थिरस्थावर बनलेला सांपडल्यावर ब्राम्हणी सत्ताधाऱ्यांनी सगळ्या विद्यांचा आणि ज्ञानाचा मक्ता आपल्याकडे ठेवला आणि आपल्या उत्पत्तीची मूळपीठिका थेट स्वर्गातल्या ब्रम्हदेवाच्या तोंडापर्यंत नेऊन भिडविली, यांत नवल ते काय? अहंकार आणि मद काय करणार नाही?
चक्रवर्ती राजाच्या कन्येपासून तों एखाद्या चांडाळाच्या मुली पर्यंत ब्राम्हणाला वाटेल त्या स्त्रीची मुभा! स्वतःची उत्पत्ति खुद्द ब्रम्हदेवापासून झाल्याची प्रौढी मारल्यावर एका वेळी किती स्त्रियांचा स्वीकार करावा याचा धरबंधच उरला नाही. प्रेमासाठी स्त्रियांचा स्वीकार, ही कल्पनाच त्याला कधीं शिवली नाहीं. लहर लागतांच विषयवासना तृप्त करण्याकरितां शेंकडों तरुण स्त्रिया जर हात जोडून त्याच्यापुढे केव्हांहि हजर, तर प्रेमशोधनाच्या नसत्या फंदात त्यानें तरी कां पडावें? मुलें बाळें झालीच तर एखाद्या स्त्रीवर यांची प्रेमाची मेहरनजर कधीं फिरली तर एखादे वेळेस फिरावयाची.
संतति व्हावी म्हणून लग्नं करावयाचें. ती संतति कायदेशीर ठरावी म्हणून विवाहाचा खटाटोप. लग्न-संबंधांत प्रेम म्हणून कांहीं चीज आहे, पत्नीवर प्रेम करावें किंवा तिच्यापासून प्रेमाची अपेक्षा करावी. असली कोणतीहि भावना विवाहाच्या मुळाशी नसे. वधूशोधनाची खटपट करण्याची त्याला कधीं जरूरच भासली नाही. आपल्या मुलींना पदरांत घ्यावें म्हणून त्या मुलींचे आईबाप किंवा पालक आपण होऊन त्यांच्या चरणांवर आपल्या मुली घालीत असल्यावर, वधूसंशोधनाची त्याला काय जरूर पडली आहे? जर तिला मुलेच होत नसतील तर किंवा नुसत्या मुलीच होत असतील तर शास्त्राच्या अनुज्ञेप्रमाणें मुलगा होण्याकरितां दुसऱ्या बायकोची तजवीज पहाणे त्यांना भाग पडे. धर्माज्ञेपुढें त्यांचा तरी काय इलाज चालणार!
कारण, जर पोटी मुलगाच झाला नाहीं तर मृत्यूनंतर पूत नामक नरकांत जाण्याची पाळी येणार! असल्या घोर आपत्तीपासून बचाव करण्यासाठी बिचाऱ्यांना पुत्रप्राप्ती होईपर्यंत पोसवतील तितक्या स्त्रिया करण्याचा खटाटोप करणे भाग असें. इच्छित फलप्राप्ती होईपर्यंत त्यांना वाटेल तितक्या स्त्रीरूपीं शेतवाड्यांची नांगरणी पेरणी करण्याचा जन्मसिद्ध हक्कच होता.
मी हें स्वतःच्या पदरचें कांहीं तरी बनवून तुम्हास सांगत आहे असे तुम्ही समजू नका. "पुत्रार्थे क्रियते भार्या" हें हिंदु विवाहधर्मातील सूत्र तुमच्या खास ऐकिवांत असेल. विवाह आणि प्रेम याबद्दलची हिंदु समाजाची कल्पना कोणत्या कृत्रिम, यांत्रिक, पाशवी व बिनकाळजाच्या प्रेमशून्य आचारपद्धतीवर उभारलेली होती आणि ती किती घाणेरडी आणि स्त्रीवर्गाची विटंबना करणारी होती, ही गोष्ट अगदी ढळढळीतपणें तुमच्या नजरेस येईल.
असल्या बळजबरीच्या प्रेमशून्य संबंधापासून उत्पन्न झालेली प्रजा कशी होणार याचे काय भविष्य सांगण्याची जरूर आहे? राष्ट्रातील स्त्रीपुरुषांच्या आंगी राष्ट्रसंवर्धनाकरितां ज्या शारीरिक नैतिक वा आत्मिक गुणांची जरूरी असते, यांचा त्यांच्याठायीं अर्थातच पूर्ण अभाव असणार आणि असतोहि. मग आम्ही आज इतके खालावलेले आणि दुर्बल का बनलो आहोत याचीं कारणें आणखी निराळी सांगितली पाहिजेत काय?
या जगांत मानसन्मानाच्या आणि सुखोपभोगाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांची हिंदु समाजानें ब्राम्हण वर्गावर हवीतशी मनमुराद मुबलक खैरात केल्यामुळें त्या वर्गाचा स्वर्ग मात्र हातचा गमावला खास. आत्मस्तोमाला आणि चैनबाजीला ब्राम्हण आरपार लालचटला. स्वतःच्या बडेजावीची फाजील कल्पना, गिधाडाप्रमाणें सदोदित लोभी हावरटपणा आणि मनाचा नीचपणा असल्या अधर्म दुर्गुणांचा तो गुलाम बनला. स्वतःच्या हृदयांत राष्ट्रप्रेमाची जाणीवच नसल्यामुळे, प्रत्येक गोष्टीत भटांच्या तोंडाकडे पाहण्याची संवय लागलेल्या हिंदु समाजाला राष्ट्रभक्ति ही काय चीज आहे, याचें ज्ञान करून देण्याची भटांत अक्कलच उरली नाहीं.
"द्या द्या द्या ब्राम्हणांना दक्षिणा द्या, त्याला संतुष्ट करा. म्हणजे या जगांतील तुमची इतिकर्तव्यता संपून परलोकांतील शाश्वत सुखाचीहि तुमची तरतूद होईल. तुम्हांला कांहीं करण्याची जरूरीच नाहीं." ही यांची समाजाला अहर्निश शिकवण. लोकांनी शहाणे होऊन आपलें बिंग ओळखूं नये आणि आपल्या मानेवरचें अंधश्रद्धेच्या आणि बदनामीच्या गुलामगिरीचें जूं झुगारून देऊं नये, म्हणून या सुलतानी भिक्षुकशाहीनें कोणत्याहि प्रकारच्या शिक्षणाची लोकांना कधींच मोकळीक ठेवली नाहीं.
ब्राम्हणांच्या या कारस्थानांवरून बायबल मधील अडॅम आणि ईव्हच्या गोष्टीची तुम्हाला आठवण होत नाहीं कां? ईश्वरानें अडॅम व ईव्ह यांना ईडनच्या बागेंतील ज्ञानाचें फळ चाखण्याची जशी सक्त मनाई केली होती. तसाच प्रकार या ब्राम्हणांनी केला. या `देवांच्या आज्ञा` म्हणून समजूत झालेल्या हिब्रू, मुसलमान आणि क्रिश्चन समाजाचे किती नुकसान झालें आहे याची तुम्हाला कल्पना आहे काय? हिब्रू, मुसलमान व क्रिस्ती लोकांना त्यांच्या भिक्षुकशाहीनें हिंदु प्रमाणेंच, पूर्ण अज्ञानांध:कारांत ठेवले आहे.
क्रिस्ती समाजाला चर्चच्या धार्मिक मगरमिठींतून आपण सुटलों आहोत असें अझून तरी म्हणतां येईल काय? मला नाहीं असें वाटत. भिक्षुकशाहीची मिठीच मोठी जबरदस्त असते. तरी पण त्यांतूनहि कांहीं निधड्या छातीचे क्रिस्ती निषेधक वीर जगाच्या उद्धाराकरितां सत्य आणि शास्त्रीय ज्ञान यांचे तेजस्वी पलीते पाजळीत धिटाईनें पुढें येत आहेत. जगाच्या उन्नतीकरितां ज्ञानाचा असला प्रकाश कोणत्याच भिक्षुकशाहीनें आजपर्यंत पाजळलेला नाहीं. भिक्षुकशाहीच्या छळाची दरकार न बाळगतां जगाच्या उन्नतीच्या मार्गावर उजळलेल्या या ज्ञानदीपांबद्दल आपण त्यांचे सदैव ऋणी राहिले पाहिजे.
आजचें कोणतेंहि सुधारलेलें राष्ट्र घेतलें तर त्याच्या राज्य कारभाराचे धोरण आपली व्यापारी भरभराट कशी होईल व त्या योगानें राष्ट्राचें सांपत्तिक वैभव कसें वृद्धिंगत होईल या एकाच दिशेने आखलेलें बहुतेक आपल्या नजरेस येईल. तद्वत हिंदुंच्या वैभवकालीं त्यांच्या राज्यकारभाराचें सुकाणू स्वतःच्या हाती ठेवणाऱ्या ब्राम्हणांचे धोरण आपल्या भिक्षुकशाहीचें धार्मिक वैभव व वर्चस्व कसें वाढेल या दिशेकडेच नेहमी वळलेलें असे. आणि हें धोरण संभाळण्यासाठी समाजस्वास्थ्याची बिलकूल पर्वा न करतां आपल्या भिक्षुकशाही महत्त्वाकांक्षेच्या कुंडांत वाटेल त्या गोष्टीची आहुती देण्यास ते केव्हांहि मागें पुढें पहात नसत.
हिंदु जनांच्या सामाजिक व धार्मिक व्यवस्थेंत कोणत्याहि प्रकारें हात घालावयाचा नाहीं. हे आजच्या ब्रिटिश राजकर्त्यांचे राज्यधोरण असल्यामुळे, लोभी आणि काकवृत्ती कपटी भिक्षुकशाही तापल्या तव्यावर हव्या तशा पोळ्या भाजून घेत आहे. या नामी संधीचा फायदा घेऊन आपल्या भरंवशाच्या कुळांना, आजच्या अज्ञानी धर्मभोळ्या व अन्नाला मोताद झालेल्या दरिद्री हिंदु जनांना, नागवून ते वाटेल तशी चैन करीत आहेत.
ब्राम्हण पुरोहितांनों, हिंदुस्थानच्या आध्यात्मिक संपत्तीच्या बादशाहानों, तुम्ही निर्माण केलेल्या या दगडासारख्या चैतन्यहीन समाजघटनेच्या गुलामांनों, तुम्ही घमेंडखोर हेटाळणीनें आमच्याकडे पाहून हसत आहांत, हें आम्हाला कळत आहे बरें! पण, मेहरबान, लक्षांत ठेवा, मी तुम्हाला बजावून ठेवतों कीं, तुमच्या अंतःकरणांत हिंदुस्थानाबद्दल अझूनहि किंचित प्रेम असेल, तर हें तुमचें विकट हास्य जागच्या जागीं जिरून तुमच्या डोळ्यांतून अश्रूंचे पाट वाहू लागतील. जरा डोळें उघडून आजूबाजूला नजर टाका. जगांतील इतर धर्मांच्या छत्राखाली वावरणाऱ्या समाजांची स्थिती काय आहे आणि तुमच्या स्वतःच्या छायेखाली नांदणाऱ्या या अफाट जनसमाजाची आज काय दशा आहे? इतिहासाचा मागमूसहि नीट लागत नाहीं अशा अनादि कालापासून पिढ्यानपिढ्या या लोकांचे पूर्वज तुमच्या धर्माच्या आणि संस्कृतीच्या झेंड्याखालीं वावरले, त्यांना तुम्ही मन मानेल त्या अंधश्रद्धेचे बौद्धिक आणि धार्मिक कल्पनांचे दिलेले धडे त्या बिचाऱ्यांनी निमूटपणें, बिनतक्रार, भोळसट गुलामी भावानें घटविले. त्या या पुराण समाजाचे आज काय धिंडवडे उडाले आहेत याचा जरा नीट तपशीलवार विचार करा, म्हणजे ते अश्रूहि जागच्या जागी थांबतील. डोळे कोरडे ठणठणीत पडून त्यांतून रक्ताचे थेंब पडूं लागतील. पण ही डोळ्यांवरची धुंदी बाजूला सारून वस्तुस्थितीचें नीट आकलन कराल तर!
कार्यपद्धतीच्या या तुमच्या विशिष्ट धोरणामुळे हिंदु समाजातील पुरुषत्वाची आणि स्त्रीत्वाची कशी माती होत चालली आहे. याची तुम्ही जाणीवहि करून घेत नाही. तुमची आचार विचाराची आणि समाजघटनेची पद्धत हिंदु समाजातील स्त्रीपुरुषांचे ऐन उमेदीचे रक्त एखाद्या डाकीनीप्रमाणे घटघटा शोषून घेत आहेत. बालपणांतून पुढे पाऊल टाकल्यावर चैतन्यपूर्ण ऐन धडाडीचें पण तितकेंच निष्पाप असें मुसमुसणारें तारुण्य त्यांना कधींच प्राप्त होत नाहीं. मनुष्याच्या जीवनक्रमांतील रसरशीत तारुण्याची ही अवस्था आज हिंदु समाजाला पारखी झाली आहे. पण जगांतील कोणत्याहि सुसंस्कृत आणि जिवंत समाजाकडे पहाल तर त्याची घटना याच निसर्गदत्त चैतन्याच्या अभेद्य पायावर उभारलेली आहे, असंच तुम्हाला आढळून येईल.
तुमच्या समाजांतील तरुण व तरुणी कधींच एकत्र येत नाहींत. विचार व विकार-विनिमयासाठी एकत्र मिसळण्याची त्यांना कधी संधीच मिळत नाहीं. यच्चावत वस्तुमात्राला स्पर्शमात्रानेंच रोमांचित करणाऱ्या ईश्वरदत्त प्रेमाच्या जादुची भावना त्यांच्या हृदयांत कधींच स्फुरण पावत नाहीं.
हिंदुस्थानाचें नांव कीर्तीमान करून, स्वतःचा काव्यलौकीक अजरामर करणारा `शब्दसृष्टीचा ईश्वर` कालीदास यानें आपल्या चिरंजीव `कुमार संभव` काव्यांत रेखलेलें कुमारी महासती पार्वतीचें सहजसुंदर दृश्य पहा. तारुण्याचा उमलता बहार तिच्या कांतीला उजाळा देत आहे. उमलत्या यौवनानें सर्व अवयवांची वाढ, नकळतच पण जोरानें फोंफावल्यामुळें, तारुण्यमदाच्या भारानें ती कुमारिका लवली आहे. यौवन-चैतन्यानें आपल्या देहावर व कांतीवर कसले तेज उधळलें आहे, त्याचें प्रतिबिंब आरशांत पहाण्याचेहिं तिला भान उरलेलें नाहीं. गजगतीने हळूहळू पावले टाकीत, कुमारी पार्वती, आपल्या प्रेमसर्वस्वाकडे-आपल्या शिव देवाकडे-कडेकपारांतल्या एकांत गुहेकडे चालली आहे. आपल्या प्रेमदैवतानें समाधींतून जागृत होऊन प्रेमाच्या दृष्टीला प्रेमाची दृष्टी भिडवावी म्हणून तिनें शिव देवावर फेकलेला तो पहिलाच दृष्टीकटाक्ष, शिव देवाची समाधी उतरली. त्यानीं आपले अकामुक विशाळ नेत्र उघडले. तृतीय नेत्रांतल्या तेजानें कामदेव भस्म केला. कुमारी पार्वतीचे पाणिग्रहण केलें. किती मनोहारी, किती निसर्गसुंदर आणि किती यथातथ्य तपशिलाचें हे चित्र वागीश्वर कालीदासानें रंगवून ठेविलें आहे? त्याच या हिंदु-स्थानांत तसल्याच दिव्य कुमारिकांना प्रेम करण्याची-आपल्या वल्लभांची-हृदयस्थ शिवाजी-पूजा करण्याची-कधीं तरी कसली तरी संधी देण्यांत येत असते काय?
मुसमुसणाऱ्या तारुण्याचा विकास होण्यापूर्वी त्या बिचाऱ्यांचें दैव ठरून जाते. त्यांच्या नशिबाचा तो बेशरम खेळखंडोबा अधिक स्पष्ट करून सांगावयास पाहिजे काय? तुम्हाला तो माहीत नाहीं काय? तुम्हा भटांच्या मध्यस्थीशिवाय ज्याची सांगताच नाहीं, अशा `सनातन हिंदु विवाह` या गोंडस नांवाखाली तुमच्याच डोळ्यांसमोर चाललेला त्यांच्या बळजबरीच्या कौमार्यभंगाचा लज्जास्पद समारंभ तुम्हाला दिसतच नाही काय? ज्याचे तुम्ही नेते आणि प्रमुख म्हणून मिरवितां त्या या हिंदु समाजाची त्या पापाच्या पेटलेल्या यज्ञांत राखरांगोळी होत आहे याची तुम्हाला जाणीवच नाहीं अ? हे सर्वसाक्षी देवतांनों, हा धर्मभ्रष्ट पतित ब्राम्हण धर्माच्या नांवाखाली घालीत असलेला समाज-विध्वंसनाचा हा नंगा नाच तुम्ही असाच खुशाल चालू देणार काय? प्रत्येक दिवशी अधिकाधिक खोल खाड्यांत आम्ही चाललो आहों. या असह्य अधोगतीपासून वाचविण्याला स्वर्गांत, नरकांत, या अखिल विश्वमंडलांत कोणतीच समर्थ शक्ती उरली नाहीं काय!
`आधुनिक बॅबिलॉनमधील कुमारिकांचे बलिदान!` कुमारिकांचे हें कौमार्य-बलिदान जेथें प्रत्यहीं चालतें, तें विसाव्या शतकांतील बॅबिलॉन तुम्हास कोणते वाटतें? लंडन? पॅरिस? न्यूयार्क? नाहीं. मी शतवार सांगतो खास नाहीं. तेथला `नरपशू` अमेरिकन किंवा युरपियन समाजनीतीच्या दृष्टीने कितीहि हिणकस असला तरी हमखास जास्त सुधारलेला (माणसांत आलेला असतो. मी बिनदिक्कत सांगतो की, हे आधुनिक बॅबिलॉन जर कोठें असेल तर ते `हिंदु-हिंदुस्थान`च होय! येथेंच दररोज धार्मिक विवाहाच्या बुरख्याखालीं कल्पनेलाहि थांग लागणार नाहीं असल्या क्रूर आणि राक्षसी रूढींच्या कुंडात लक्षावधि कुमारिकांचे बळी बिनदिक्कत दिले जातात.
असल्याच एका `दिव्य कुमारी`चा एक हिंदु बाप माझ्या ओळखीचा होता. त्या बिचारीला जन्मापासूनच कांहीं तरी काळजाचा विकार होता. तिचा बाप चांगला शिकलेला सवरलेला, श्रीमंत व नांवाजलेला वकील होता. नांवाजलेल्या प्रविण डॉक्टरांनी त्याला बजावले होते की हिच्या लग्नाच्या भानगडीत तुम्ही मुळींच पडू नका. कारण तसला संबंध (sexual excitement) ताबडतोब तिच्या मृत्यूला कारण होईल. पण ऋतुप्राप्तीच्या अगोदर मुलीचें लग्न झालेच पाहिजे, हे आमचे भिकारडे भिक्षुकीशास्त्र तिच्या नशिबाच्या आड आलें. उघड उघड कोणी तरी पाजीपणानें असले मूर्ख निर्बंध शास्त्रग्रंथांत घुसडून दिलेले दिसत असतांना सुद्धा, ते अनुल्लंघनीय म्हणून शहाणेसुर्ते लोकसुद्धा उराशीं घट्ट आवळून धरतात! शास्त्राज्ञेच्या भीतीनें त्या सुशिक्षित वकीलाच्या आईनें आणि बायकोनें मुलीच्या लग्नाबद्दल इतका हट्ट धरला की, शेवटीं त्यानें त्यांच्या म्हणण्यास रुकार दिला आणि मुलीला एकदाची कशीबशी उजवली. मला त्या लग्नाचें आमंत्रण होते, पण मी गेलो नाहीं. ती मुलगी लग्न झाल्यापासून तीन महिन्याच्या आतच हृदयाच्या विकाराने वारली!
हिंदु कुटुंबांत असली अकाली मृत्यूंची उदाहरणे हजारों सांपडतील. आता, ही गोष्ट हिंदु कुटुंबांतला जबाबदार माणूस कबूल करील किंवा नाहीं, ही गोष्ट अलाहिदा!
असल्या घातुक गोष्टी एखाद्या रॉयल कमिशनने किंवा कौंसिल मधील एखाद्या ठरावानें नाहींशा होणें शक्य नाही. या करितां आईबापांच्या व पुरोहितांच्या मनांत माणुसकीची जाणीव आणि नैतिक धैर्य यांचाच उदय झाला पाहिजे; आणि एकंदर हिंदु समाजांत मनाची विवेक-जागृति आणि सामाजिक आचार विचारा संबंधाने प्रगल्भ व उदार धोरण उत्पन्न झालें पाहिजे. माझी सगळी यातायात या करितांच आहे.
हा सर्व अमानुष प्रकार पाहिला म्हणजे मला वाटतें कीं हे राक्षसी विवाहविधी चालविणारे पुरोहीत आणि वधूवरांचे आईबाप यांना जर कशाची उपमाच द्यायची असेल तर ती जगन्नाथाच्या प्रचंड रथाच्या चाकांचीच. ना त्यांना कसली भावना ना काळजाची तिडीक! जगन्नाथाचा प्रचंड रथ आपल्या चाकांखाली आमच्या कुमारिकांना बेगुमानपणें चिरडीत एक सारखा फिरतच आहे. पण हा सगळा नाश थांबवील असा धणधाकट मनाचा खंबीर मायेचा पूत आमच्या समाजात एकहि दिसत नाहीं.
मनाचा हा नैतिक कमकुवतपणा आमच्या अधःपाताचे अगदी खास लक्षण आहे. यामुळें सगळ्या जगापुढें आम्हाला लाजेनें खाली मान घालावी लागत आहे.
आणि जो या तुमच्या `दिव्य कुमारी`चे पाणिग्रहण करतो, त्याची काय वाट? त्याच्याबद्दल मी दोन शब्द सांगू का? त्याचेंहि यात बलिदान होत नाहीं काय? बोलून चालून जातीचा तो पुरुष, शिकारी वृत्तीचा. आयुष्यांत थोडा वेळ तरी त्याला शिकार करण्याची मोकळीक द्याल कीं नाहीं? एकोणीस वीस वर्षांच्या आंत त्याचे आईबाप त्याचे लग्न करोत वा न करोत. तरुण स्त्रीची प्रेमयाचना करण्याची त्याची निसर्गजात भावना चुरडली जाणें शक्य नाही. तरुण कुमारीच्या प्रेमयाचनेंत काय लज्जत असते, याचा एकदा तरी अनुभव घेतल्याशिवाय त्याची लालसा तृप्त व्हायची नाहीं. जशा लहानपणी गोंवर कांजण्या एकदां येऊन जायच्याच. त्यांतलाच हा निसर्गजात प्रकार आहे. योग्य दर्जाच्या कुमारिकांशी बोलण्या चालण्याची त्याला मोकळीक द्या आणि एकदां तरी १७ ते २१ वर्षांच्या वयाच्या दरम्यान त्याला निष्पापपणे जबरदस्त अशा प्रेमपांशात खुशाल सापडू द्या. झाले तर यांत अंतीं त्याचे हितच होईल.
प्रेमयाचनेच्या सगळ्या धडपडी यशस्वी होता क्षणींच तारुण्यानें मुसमुसणाऱ्या त्या तरुणाला भावी जीवनग्रंथीचा इषारा म्हणून मिळणारें प्रेमाचें बक्षीस-त्या निष्पाप कुमारीचें खास पहिलें गोडसें चुंबन! बस्स. त्यापुढें कोणत्या मोलवान् बक्षीसाची आठवण त्याला सर्व आयुष्यभर विशेष सुखदायक होईल? या बक्षीसाची किंमत कोण करणार? आणि याची आठवण कशानें बुजणार? माझी खात्री आहे, की तुमच्या त्या `प्रेमचंद रॉयचंद स्कालरशिपा` किंवा ती `टागोर लॉ मेडलें` यांपेक्षा त्याला त्या प्रथम चुंबनाची किंमत खात्रीने जास्त वाटेल. सर्वसाधारण व्यवहाराकडे पाहण्याची त्याची दृष्टी, विशेषतः स्त्रीविषयक दृष्टी, जास्त उदार आणि नीतिमान् होईल. खरें पौरुष किया वीरत्व कशांत आहे याची त्याला नीट जाणीव होईल. अनादि `स्त्री`त्वांत गूढ असलेल्या पावित्र्यांचें दिव्य तेज कसें लकाकतें हें त्याला नीट कळेल. कारण त्या तेजाची कल्पना त्यानें मिळविलेल्या पहिल्या कुमारी चुंबनांत त्याला होणें शक्य असते.
त्यांची गोड आठवण, त्या प्रसंगाचा विचार पुढील आयुष्यांत कर्तव्याचे निरनिराळे झगडे लढतांना त्याला स्फुरण देतील. किती तरी मोहांच्या सापळ्यांपासून आणि संकटांपासून त्याचे संरक्षण करतील. भयंकर निराशेंत सांपडला असतांना त्यामुळें पुष्कळ वेळां त्याला धीर येईल. एक क्षणमात्रच कां होईना, पण पूर्ण विश्वासानें झाडाच्या फांदीवर बसून अगदीं हृदयाच्या हृदयातले खोल बोल गाऊन, पुन्हा स्वतंत्रपणे कोठल्याहि प्रकारें पतित भ्रष्ट न होता स्वतंत्र अमर्याद आकाशांत मोकळेपणाने भराऱ्या मारण्यासाठी उडून जाणाऱ्या जंगली पक्षाच्या त्या क्षणमात्र आनंदाची तुलना, पिंजऱ्यांत कोंडलेल्या पक्षाला जन्मभर मिळणाऱ्या लडिवाळपणाशीं होणें कधीं तरी शक्य आहे काय? हल्लीं हिंदु तरुणाला आपल्या पौरुषाबद्दल व वीर्याबद्दल जी भावना वाटते त्यापेक्षां किती तरी अधिक स्वाभिमानाची भावना त्याच्या अंतःकरणात उत्पन्न होईल. हल्लीं त्याच्या मनांत एका बाजूला अभिजात शुद्ध निसर्गबुद्धि आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या डोक्यांत लौकिकी कल्पनांनी `मज्जाव मज्जाव` म्हणून उत्पन्न केलेली तिरस्कार बुद्धी यांचा सारखा झगडा चाललेला असतो. पण किती झालें तरी तो स्त्रीच्याच उदरांतून जन्माला आलेला! कितीहि शिकवण दिली तरी त्याची स्त्रीविषयक निसर्गबुद्धी वर उसळी मारल्याशिवाय कशी राहणार?
त्याचा मूळचा शुद्ध स्वभाव लग्नसंबंधाच्या निमित्तानें दूषित होण्यापूर्वीच जर त्याला आयुष्यांतील असला मोकळेपणाचा वाव मिळाला, तरच आजच्या चहूंकडून जखडलेल्या परिस्थितीत जें जीवनरहस्य अनुभवणें त्याला शक्य नाहीं तें सुलभ होईल. त्याचें मनोहारी चित्र तो पहात असतो. हिंदुस्थानांतील वैष्णव कवि आणि शाळेच्या अध्ययनक्रमांत परिचित झालेले परदेशीय कवी यांनीं आपल्या काव्यांत त्या जीवनाच्या रहस्यांची खरी गोडी गायलेली तो ऐकत असतो. आत्म्याचें तें पौष्टिक रसदायक अन्न आहे, हें त्याला एरवीं कसें कळावें? चंडीदासारख्या कविवरांनी आपल्या दिव्य गीतांत त्या दैवी जोडप्याचें-श्रीकृष्ण राधा यांच्या अकामुक प्रेमाचे-अनुपमेय चित्र रंगविले आहे तितकें नितांतमधुर, साधें, भावनागंभीर आणि भव्य चित्र इतरत्र कोठेंहि आढळणें मुष्कील आहे. त्याचप्रमाणे शेक्सपियर किंवा शेले, बायरन, टेनिसन, ब्राउनिंग यांसारख्या आंग्ल कविवरांच्या काव्यांतून रसरसणाऱ्या जीवनाच्या रहस्याचें खरे मर्म त्याला नीट कळू लागेल. मानवी समाजाबद्दलचे त्याचे विचार अधिक व्यापक होतील. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे आज घोकंपट्टी करून बऱ्याचशा युनिव्हरसिटी डिग्ऱ्या मिळविल्यानें त्याच्या अंगीं जितकी पात्रता येते, त्याच्या शतपट अधिक खरी पात्रता त्याच्या अंगी येऊन, हिंदुस्थानचा सुपुत्र या नांवाला तो अक्षरश: पात्र होईल. पण केव्हां? त्याच्या प्रेमशोधनांत व विवाह-स्वातंत्र्यांत आज हमखास येणारे अडथळे बंद पडतील तेव्हां!
एवढ्या मोठ्या अफाट हिंदुस्थानांत तरुण स्त्री पुरुष कधींच एकमेकांच्या प्रेमपाशांत सापडत नाहींत; आणि जर यदाकदाचित प्रेमभावना उदित झालीच तर तिचें पर्यवसान अकालीं व अनिष्ट पितृपद किंवा मातृपद यांतच व्हायचे! या विस्तीर्ण देशांत तरुण पुरुषाला आपल्या आयुष्यांत पहिल्या कुमारीचुंबनाची गोडी अनुभवण्याची कधींच संधी मिळत नाही. त्यामुळे नसानसांतून ज्याची स्मृति सळसळत जाईल आणि त्याला उमदा माणूस बनवील, अशा त्या अनुपम अनुभवाला तो कायमचा मुकतो. ही गोष्ट अत्यंत अप्रयोजक आणि निसर्गाविरुद्ध आहे, असें माझे ठाम मत आहें, त्यामुळें प्रत्येक हिंदु तरुणाला पुढें नाना क्लेश भोगण्याचा प्रसंग येतो. निराशेच्या झटक्यांत तो आरपार खचतो. हृदयाला तर इतकी दुर्बलता प्राप्त होते की संसाराच्या उघड्या व्यवहारांत पडल्यावर बाजारच्या एखाद्या हलकट स्त्रीच्या पहिल्याच कटाक्षानें तो पतित होण्याचा जबरदस्त संभव असतो.
स्त्री व पुरुष दोघांनाही हिंदुस्थानांत तारुण्याचा उमलता बहार काय असतो याची जाणीवच कधीं अनुभवण्यास मिळत नाही. लहानपणीच त्यांच्या मानेवर पितृपदाचें किंवा मातृपदाचे जड जूं जबरदस्तीने लादण्यांत येते. आईबापांच्या असल्या अपरिपक्व दशेंत जन्माला आलेली मुलें शरीरानें दुबळी तर असतातच, पण राष्ट्राची प्रतिष्ठा किंवा वैभव कायम टिकविण्यास किंवा वाढविण्यास त्यांतील स्त्री पुरुषांच्या अंगीं जी ओजस्विता लागते, किंवा पुरुष अथवा स्त्री ह्यांच्या जीवनाची सार्थकता होण्यास ज्या जोमदार गुणांची आवश्यकता लागते, त्यांचाही त्यांचा ठिकाणी पूर्ण अभाव दृष्टीस पडतो. मग युरपियन लोकांनी आम्हाला रानटी किंवा पतित म्हणूं नये, तर काय म्हणावें?
****
भाग ३
राष्ट्र या नात्यानें हिंदुंचा जो ऱ्हास आणि अधःपात झाला आहे त्याची सर्व जबाबदारी ब्राम्हण भिक्षुकशाहीवरच आहे. राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या वा आध्यात्मिकदृष्ट्या सर्व तऱ्हेने आम्ही निःसत्व झालो आहोंत. विचार करण्याची, तुलना करण्याची, चिकित्सा करण्याची आमची बुद्धीच ठार मेली आहे. आचार विचार व आमच्या चालीरीती यांनी आमचे रक्त नासून गेलें आहे, दृष्टी आंधळी झाली आहे आणि म्हणून आम्हाला जगाचें खरें स्वरूप तर दिसत नाहींच, पण इतर राष्ट्रांतील सुधारलेले लोक आमची योग्यता काय समजतात हेंहि आम्हांला नीट समजत नाहीं.
बाहेरच्या जगाचें अवलोकन करणें, इतर देशांत स्थापन झालेल्या निरनिराळ्या संस्थांचे परिशीलनपूर्वक स्वाध्याय करणें, आपल्या संस्थांशी त्यांची तुलना करून त्यातील दोष काढण्याचा प्रयत्न करणें, इत्यादि अनेक मार्गांनी मानवी उन्नतीला पोषक असें खरें शिक्षण मिळविण्याचा आमचा हक्क जन्मसिद्ध आहे. केवळ जातीभेदाच्या निष्ठुर कडकपणामुळे किंवा `जग हें मिथ्या आहे` असल्या मूर्खपणाच्या मायावादामुळे तो हक्क आम्हीं समूळ गमवावा असे तुमचे म्हणणे आहे काय?
आजच्या हिंदु जगांत ब्राम्हणपंथ, बुद्धपंथ, जैनपंथ, शीख, शैव, शाक्त, वेदान्त, ब्राम्ह, भक्ति, आर्यसमाज, तांत्रिक (हा ब्रम्ह घोटाळा आणि त्यांत दररोज होणारी भरसाट पैदास जगाच्या अंतापर्यंत तरी संपेल किंवा नाहीं कोण जाणें!) - असल्या शेंकडों पंथांनी माणसांचा प्राण घेण्याची वेळ आणली आहे.
पण इतके नानाविध पंथ निर्माण झाल्याने समाजस्थैर्याचें परस्परविरोधी वेडेवाकडे हजारों तुकडेताकडे उडून, त्यांत पुन्हा केव्हांहि एकी अगर एकतानता उत्पन्न होणें मुष्कीलीचें जाईल. याचा आमच्या ब्राम्हणगुरूंनीं चुकून तरी कधी इषारा दिला होता काय?
भारतवर्षाच्या इतिहासांत या निरनिराळ्या पंथांत आणि धर्मभेदांत एकमेकांवर मात करण्याकरता झालेल्या भयंकर झगड्यांचे दाखले वाटेल तितके सांपडतील. पण आमचा भिक्षुक गुरूदेव सर्व ठिकाणी हजर! सर्वांजवळून तो भरभक्कम दक्षिणा-बक्षीस-हबकतोच आहे. "अहो, पूर्वीपेक्षां इतके अधिक रस्ते झाले की स्वर्गांत जायला! नद्या कोठूनहि निघाल्या तरी अखेर समुद्रालाच मिळणार की नाहीं? वा, फार उत्तम : खरोखर ईश्वराची करणी अगाध आहे." हें आणखी वर म्हणायला तयारच.
बनारसला मला एकदा एक ब्राम्हण भिक्षुक भेटला होता. विधवा-पुनर्विवाहाच्या मंडणाची भाषणे ऐकून तो अगदीं भेदरून गेला होता. तो मला येऊन सांगू लागला कीं `जर सगळ्या हिंदु विधवा पुनर्विवाह करू लागल्या तर आम्ही भटभिक्षुकांनी आपली पोटें तरी कशी भरायची?` मी त्याला काय उत्तर दिलें तें सांगितलें पाहिजे असें नाहीं. मी असाच एका हाऊस एजंटला त्याच्या धंद्याबाबत प्रश्न केला. त्यानें अगदीं मनमोकळेपणाने सांगितले कीं, प्रत्येकजण जर सारख्या आपल्या राहाण्याच्या जागा बदलीत राहील, तर काय बहार होईल? उठल्यासुटल्या वेळी अवेळी लोकांनी कायदेबाजीसाठी कोर्टाकडे धांव घ्यावी अशीच वकील लोकांची मनांतली इच्छा असेल. डॉक्टरदेखील रोगांच्या साथी एकसारख्या एकामागून एक येत रहाव्या, अशीच मनांतून अपेक्षा करीत असतील. समाजाच्या जिवावर बांडगुळाप्रमाणे जगणाऱ्या या असल्या धंद्यातल्या स्वार्थीपणाचा उल्लेख आपण बहुश: थट्टेनेंच करीत असतो.
परंतु, एक राष्ट्रच्या राष्ट्र शतकानुशतकें एकसारखें ब्राम्हण भिक्षुकशाहीच्या पुरतें कबजांत सांपडलेलें असावें आणि त्याला त्यांनी वाटेल तसें मनमुराद लुटीत रहावें, त्यावर हवें तसें चरावें, ही गोष्ट खास थट्टेवारी नेण्यासारखी नाहीं, या हिंदु भारतखंडासारख्या भिक्षुकशाहीच्या पचनी पडलेल्या देशांत सर्वत्र भडकलेल्या सामाजिक अन्यायांच्या राक्षसीपणापासून समाजाला वांचवावें, अशी थोडीशी तरी बुद्धी आणि विवेकजागृती असलेले स्त्री पुरुष थोडेहि सांपडूं नयेत काय? या सामाजिक अन्यायाचा जहरी घातुकपणा धार्मिकपणाच्या साखरेची कितीहि पुटे त्यावर चढविली तरी यत्किंचितहि कमी होणार नाहीं, हे विसरता कामा नये.
आतां, या गोष्टीचा जाब तुम्ही ब्राम्हण भिक्षुकाला विचारायला जा. तो ताबडतोब मनु, याज्ञवल्क्य, रघूनंदन यांच्या ग्रंथांतील शास्त्रार्थाचे उतारे तुमच्या तोंडावर भराभर फेंकून या बड्या धेंडांवर सगळी जबाबदारी टाकून आपण पार मोकळा होईल. तो स्पष्ट म्हणतो, "मी काय, हिंदु समाजाचा एक गरीब धर्मसेवक, हिंदुधर्मात ज्यांना रहावयाचे असेल त्यांनी या थोर थोर पुराण पवित्र धर्मग्रंथांतील नियमांचे परिपालन केलेच पाहिजे. त्याशिवाय गत्यंतरच नाहीं. ते तसें होतें किंवा नाहीं हें पहाणारा धर्माचा मी चाकर. यांत माझ्याकडे काय दोष आहे? ज्यांना या नियमांच्या बंधनाची खोडाबेडी नको असेल, त्यांना खुशाल दाही दिशा मोकळ्या आहेत. त्यांनीं खुशाल हिंदुधर्माच्या बाहेर चालते व्हावे."
लोकांचे गुरू म्हणून मिरवणाऱ्या भटाभिक्षुकांची ही गुर्मीची प्रवृत्ती जितकी मूर्खपणाची तितकीच खोडसाळ आहे. याचा परिणाम असा झाला आहे की यच्चावत हिंदुमात्रांनी धर्मग्रंथांच्या ठरावीक कैदखान्यांतच सदोदित बंदीवान होऊन पडलें पाहिजे. प्रत्येकानें ब्राम्हण भिक्षुकांचें दास्य बिनशर्त मानले पाहिजे. या भिकारड्या धर्मग्रंथांमुळेच भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाचा टेंभा आजपर्यंत जगलेला आहे. त्याचा कोणी `बोर्या` उडवूं नये, म्हणून त्या ग्रंथांचा अस्सल-कम-अस्सलपणा संशोधन करण्याची मात्र सर्वांना बंदी!
परंतु आतां नवीन नवीन विद्या आणि संशोधनाची आधुनिक पद्धति यांच्या योगानें या ग्रंथांचें सर्व धार्मिकब्रुव चिकित्सक परिक्षण करणें साध्य झालें आहे. त्यांचा मूळ उगम, त्यांचा हेतू आणि त्यांतील वचनांची योग्यायोग्यता व सत्यासत्यता या सर्व गोष्टी ऐतिहासिक दृष्टीनें समजून घेणे सहजशक्य झाले आहे. ही गोष्ट आता अगदी हमखास सिद्ध झाली आहे की, आदि मनू उर्फ वृद्ध मनू अजिबात नाहींसा होऊन त्याच्या जागी आजचा भिक्षुकशाही वर्चस्वाचा पुरस्कर्ता नकली मनू आणून उभा केला आहे. आज ज्या स्थितीत तो आपणाला आढळतो त्या स्थितीला येईपर्यंत भिक्षुकशाहींच्या हितसंरक्षणाकरतां भिक्षुकांनी किती तरी वेळा त्याच्यांत हवी ती वचनें घुसडून दिली. पुष्कळ वेळां तो पुन:पुन्हा नवीन लिहून काढण्ण्याच्याहि खटपटी झाल्या. बुद्धोत्तर काळीं ज्या ज्या वेळीं भिक्षुकी आणि भिक्षुकशाही राजसत्ता प्रबळ झाली त्या त्या वेळी हा सर्व खटाटोप भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाकरतां करण्यांत आला.
बुद्ध धर्माच्या प्रळयानंतर नवीन ब्राम्हणी सृष्टी निर्माण करण्याकरतां भिक्षुकशाहीने मनूच्या बाबतींतच नव्हे, तर आपल्या सर्व धर्मशास्त्राग्रंथांमध्ये वाटतील तीं वचनें घुसडून देण्याचा खटाटोप केलेला आहे. हा सर्व उपद्व्याप करतांना अर्थातच जुन्या इतिहासाची छाटछाट करणें प्राप्त झालें. पण हे काम तरी सफाईत कसचे साधणार? इतिहास बनावट बनला, तरी त्याच्या मजकुरांत औचित्याचा भंग, कालमर्यादेची असंभाव्यता, कालानुक्रमाकडें दुर्लक्ष, आणि भोंवतालच्या समकालीन खऱ्या परिस्थितीचा ब्रम्हघोटाळा, या गोष्टीं त्यांना टाळतां आल्या नाहीतच.
ह्या नवीन सजावटींची सुरुवात प्रथम टीकांच्या रूपाने सुरू झाली. मनूवरील प्रसिद्ध मेधातिथीची `व्यासमनू` नामक प्रचंड टीका इसवी नवव्या शतकांत रचली गेली. (हिंदुस्थानवर इस्लामियांचा पहिला हल्ला ८ व्या शतकाच्या आरंभी आला) पण ही टीकासुद्धां दीघचा राजा मदनपाल याच्या दरबारच्या पंडितांनी १५ व्या शतकांत पुनः संशोधन करून नवीन स्वरूपात तयार केली.
याच १५ व्या शतकांत बंगालमध्ये दोन प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेल्या. एक भिक्षुकी स्मृतिलेखक रघुनंदन आणि त्याचाच समकालीन् दुसरा वीर म्हणजे भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला पायबंद लावून, जातिभेदाच्या मुळावर घाव घालणाऱ्या ब्राम्हणविरोधी वैष्णवपंथाचा दोन शतकेपर्यंत देशांत धुमाकूळ घालणारा सुप्रसिद्ध श्रीचैतन्य हा होय.
१७५७ च्या प्लासीच्या लढाईनें मुसलमानीं सत्तेला ठोकर मारल्यानंतर, लवकरच नडियाचा ब्राम्हण राजा आणि नवद्वीपचे ब्राम्हण पंडित यांच्या एकत्र खटपटीने रघुनंदनची स्मृति राजेसाहेबांच्या तळघरांतील रद्दींतून वर डोकें काढू लागली. जो बंगाल एकदां जातीभेदशून्य बुद्धप्रदेश होता आणि जो पुन्हां एकदां जातिभेदयुक्त वैष्णवप्रदेश बनला होता, त्याच वंगभूमींत ही स्मृति आतां सामाजिक व धार्मिक कायदा बनून राहिली आहे.
याज्ञवल्क्य स्मृतीकडे नजर फेकली तरीहि असेच दिसून येईल की, हल्ली याज्ञवल्क्य स्मृति म्हणून व्यवहारांत वावरणारा ग्रंथ त्या प्राचीन वैदिक ऋषीवर्याचा मुळींच नाहीं. हल्लींची ही स्मृति त्याचा शिष्य म्हणविणाऱ्या कोणातरी शुक्ल यजुर्वेदी शाखेच्या गृहस्थाची कृति असावी. पराशर व मनू यांची गृह्यसूत्रें आणि कात्यायनांची श्राद्धसत्रें यांची त्याला अर्थातच माहिती असावी. ह्या स्मृतीलाहि आजचे स्वरूप येईपर्यंत पुष्कळच घुसडाघुसडीचे पलांडे खावे लागले आहेत.
हे शास्त्रग्रंथ अस्सल की कमअस्सल, त्यांत फेरबदल घुसडाघुसड किती झाली, कोणी केली, कां केली, कधीं केली. इत्यादि प्रश्नांचा उहापोह घटकाभर बाजूला ठेवला, तरी सुद्धां हिंदु समाजाने यावच्चंद्रदिवाकरौ या भिक्षुकी ग्रंथांच्या गुलामगिरींत खितपत पडून राहणें सर्वथैव अनिष्ट आणि अशक्य आहे. भटाभिक्षुकांचे गुलाम म्हणून नव्हे तर हिंदु समाजांतली स्वतंत्र व्यक्ती म्हणून, आमच्या घरांत अमक्या तमक्या शास्त्र वचनांचा वरपगडा असावा की नसावा, हे आमच्या विवेकबुद्धाला आणि सद्विचारांना अनुसरून आमचे आम्ही ठरविण्याची मुभा असणें अगदी अवश्य आहे. त्याचप्रमाणे अमुक ग्रंथांना मान देणारा तो हिंदु, न मानणारा हिंदुच नव्हे, असले पागल आचारनियमही आम्हांला साफ अमान्य आहेत.
या जुन्या पुराण्या ग्रंथांच्या पलीकडे एक पाऊलभरही सरकतां उपयोगी नाहीं, असल्या दुष्ट बंधनामुळें आपण आपल्या स्वत:वर व आपल्या समाजावर कसली भयंकर आपत्ती ओढून आणीत आहोत, याची यत्किंचितही जाणीव या धर्मगुरूंना दिसत नाही. यामुळें प्रतिवर्षी शेकडों लोक एकामागून एक हिंदु समाजाच्या बाहेर जात आहेत. अर्थात् आर्यवंशाच्या या घोर आत्मघाताची जबाबदारी सर्वस्वी भिक्षुकशाहीच्याच माथ्यावर आहे.
अशा रितीनें आज वर जे लक्षावधि लोक इस्लामी किंवा क्रिस्ती धर्मांच्या कळपांत गेले व जात आहेत, त्यामुळें हिंदु जगताची केवढी भयंकर हानी झाली आहे याची थोडीशी कल्पना करा. या ब्राम्हण धर्मगुरूंनी आपल्या पूर्वजांच्या उदार धोरणाचे थोडेसें जरी अनुकरण केलें असते आणि प्राचीन काळी ज्या व्यापक उदात्त बुद्धीनें त्यांनीं अखिल भारतवर्ष ब्राम्हणधर्माचा अनुयायी बनविला तेंच उदार धोरण त्यांनी तसेंच चालू ठेवलें असतें. तर संकुचित व क्षुद्र बनलेल्या हिंदुधर्माविरुद्ध बौद्धधर्मीय बंडच काय, पण पुढें वेळोवळीं उद्भवलेले निरनिराळें तंटे बखेडे कधींच जन्माला आले नसते.
हिंदु समाज आतां इतका अधोगतीला गेला आहे की, यापुढें जर आपला पूर्ण नाश होऊ द्यावयाचा नसेल तर या ब्राम्हणाला हिंदु समाजाच्या गुरुपदावरून एकदम गचांडी मारून खाली ढकलून दिला पाहिजे. जातीनिर्बंधाचे तट पाडून टाकले पाहिजेत आणि सामाजिक नीतिनिर्बंध आणि विवाह संस्थांचे नियम नवीन जगाला आणि नवीन काळाला पटतील अशा रितीनें आमूलाग्र बदलले पाहिजेत. अशा रीतीनें जर आपण आपल्या समाजाची पुनर्घटना केली आणि स्वतःचे घर ठाकठीक केलें तरच आपण अजून जिवंत चालती बोलती माणसाची जात आहोंत, जगाच्या पदार्थसंग्रहालयांत ठेवलेली खारवलेली आणि टाळक्यावर जुन्या ग्रंथांचे शिक्के मारलेलीं मढीं नाहींत, हें जगाच्या निदर्शनास येईल.
हे भ्रष्ट झालेले ब्राम्हण आणि त्यांचे पुराण ग्रंथ यांची रजा घेऊन आपण आता आपल्या महाकाव्यांकडे जरा नजर फेकूं. रामायण आणि महाभारत या ग्रंथांबद्दल आपल्या समाजांत किती विलक्षण आदर आहे, हें कोणास नव्याने सांगण्याचे कारणच नाही. रामायण हें तर रामजन्मापूर्वीच वाल्मिकीनें भविष्य ग्रंथासारखे लिहिलें होतें अशीच त्या ग्रंथाबद्दल बहुतेकांची ठाम समजूत आहे. त्यांच्या समजुतीने राम हा एक पूर्ण नमुनेदार पुरुष होता; एवढेंच नव्हे तर तो मानवी पुरुष नसून त्रिमूर्तीपैकी विष्णू परमात्म्याचा अवतार होता, अशी त्यांची भावना आहे. पित्यानें आपल्या सावत्र आईला दिलेलें वचन खरें करण्याकरता त्यानें सुखाने आणि स्वरखुशीने १४ वर्षे खडतर वनवास पत्करला. असा तो आत्मत्यागाचा मूर्तिमंत पुतळा होता. अशा तऱ्हेचें त्याचें वर्णन करण्यांत येते.
आपली लहान मुले कर्तव्यशील व्हावी म्हणून हिंदु मातापितरे त्यांच्याजवळून रामायण वाचून घेतात. राम, सीता, लक्ष्मण यांची माहिती बहुतेकांस लहानपणीच होते.
रामायण वाचणाऱ्या या मुलांच्या मनांवर इतर काही गोष्टींचा ठसा उमटो, वा न उमटो, पण त्यांतील एक गोष्ट सर्वांच्या लक्षांत ठळकपणे राहते. ती कोणती? रावणाच्या बंदींतून सीता सोडविल्यानंतर सर्व सैनिकांसमक्ष सीतेनें अग्निप्रवेश करून आपले पावित्र्य निष्कलंक असल्याचें सिद्ध करून दाखविल्यानंतरच रामानें तिचा स्वीकार केला होता. पण पुढे अयोध्येस आल्यावर कोणा एका सामान्य मनुष्याने सीतेच्या शुद्ध शीलाबद्दल किंचित संशय व्यक्त करतांच, रामानें पुढचा मागचा काहींच विचार न करता, सीता पूर्ण नऊ महिन्यांची गरोदर आहे हेंहि विचारांत न घेता. तिला ताबडतोब अरण्यांत हाकलून दिली. आणि हें इतकें कां? तर प्रजेची एक छचोर लहर सांभाळण्यासाठी! दैवी रामरायाने जें हें मोठे शतकृत्य केलें त्याचें अनुकरण तुमची कर्तव्यशील हिंदु बाळें करावयास मुकतील अशी का तुमची समजूत आहे? असेल तर ती साफ चुकीची आहे. किती तरी बालसीता यापूर्वी या हिंदुस्थानांत शोकभाराने मृत्युवश झाल्या आहेत. आणि मी खात्रीलायक सांगतो की, आजहि कित्येक कजाग सासवा व नणंदा यांच्या वृथा संशयाला बळी पडलेल्या शेंकडो बालसीता आपले अभागी आयुष्य रडण्यांत कंठीत आहेत. आजच्या आधुनिक कर्तव्यपरायण रामांची हृदयें कठीण करण्याकरतां अयोध्येच्या कुटाळ प्रजेची भूमिका या आजकालच्या सासवा आणि नणंदा घेत असतात.
असल्या रानटी व राक्षसी चित्राला रामायणांत दैवी रंग चढविल्यामुळे किती तरी हिंदुंच्या संसारांचा हकनाहक नाश झालेला आहे. आणि किती तरी मुग्ध बालिकांच्या जीवनसर्वस्वाचा होम झालेला आहे.
असल्या पवित्र ग्रंथांतील भूमिकेवर हिंदु-भारतवर्षांचे आजचे गृहजीवन उभारलेलें आहे. धार्मिक भावनाशील किंवा आदर्शपूजना करणारे लोक यांचा याच्यांत फारसा दोष नाही. त्यांना बालपणापासून जें शिक्षण दिलेलें असतें, त्याचीं त्यांच्या मन:पटलावर जी चित्रें कोरली जातात, तीच कायम ठशानें जन्मभर तेथेंच टिकून रहातात.
ज्या ब्राम्हण लेखकानें रामाला अशा रानटी स्वरूपांत जनतेपुढे उभा केला आहे. त्याकडे वास्तविक खरा दोष येतो. त्यांतहि पुनः या रामायणाचे सुद्धां प्रसंगाप्रमाणे आणि सोईप्रमाणे कित्येक वेळ शोधन आणि नवीन संपादन झालेलें आहेच.
आज आमच्या हातांत पडणारे रामायण हे खास कांहीं मूळचें वाल्मिकी नाही आणि विद्वानांच्या मते हल्ली उत्तररामचरित्र या नांवानें जो भाग प्रसिद्ध आहे तो तर हमखास कुठल्या तरी दूर धोरणानें मागाहून कोणीतरी घुसडून दिलेला असला पाहिजे. हें दूर धोरण काय असावें याची आपण लवकरच मीमांसा करूं.
ज्या शहाण्यानें हें उत्तररामचरित्र निर्माण केले, त्याला सीतादेवी वरच्या नसत्या संशयाची पुनरावृत्ति टाळता आलीच नसती काय? अग्निदिव्यानें संशयाची निवृत्ति जनजाहीर झाली असतांहि त्या लेखकाने काढलेले गरीब बिचाऱ्या सीतामाईचे पुढचे धिंडवडे त्याला कां टाळतां आले नाहीत? यांत त्यानें काय साधलें? सीतामाई विषयीच्या संशयाचा पुनश्च पराचा कावळा करून नाचविण्याचा या उत्तररामचरित्रवाल्याचा हेतू, हिंदु स्त्रियांना एक सणसणीत कायमचा दम भरून ठेवण्यांत आढळतो. त्याला स्त्रीजातीला बजावून ठेवावयाचे होते की, याद राखा, तुम्ही कितीही शुद्ध आणि सद्गुणी असला तरी तुमच्या विरुद्ध लवमात्रहि वेडावांकडा शब्द ऐकू आला तर, तुम्हाला बिलकूल दियामाया न दाखवितां, तुमची चौकशीसुद्धा न करता केवढी भयंकर शिक्षा तुमच्या नवऱ्यांकडून फर्माविण्यांत येईल, हे नीट ध्यानांत ठेवा. संशयाच्या नुसत्या चुटपुटत्या कल्पनेवाहि वारा तुमच्या बाबतींत आम्हां पुरुषानां क्षणमात्र खपणार नाहीं.
उपदेश करण्याच्या दिमाखानें चितारलेल्या या खोडसाळ शब्दचित्रानें सीतामाईच्या चारित्र्याला मात्र मुळींच धक्का लागलेला नाहीं. तें कमलपत्राप्रमाणे निष्कलंक आणि अवधूतच राहिले. स्त्रीजातीच्या सग्दुणांची दिव्य प्रतिमा म्हणून तिचा महिमा युगानुयुगें अधिकाधिक प्रकाशमानच होत आहे. पण-पण त्या तुमच्या आदर्शभूत दैवी रामाच्या पौरुषाचे घाणेरडे चित्र म्हणजे हिंदुस्थानाच्या पौरुषत्वाला नामुष्की आणणारी एक चिरंजीव शरमेची बात होऊन बसले आहे.
रामाला अनेक इतर ठिकाणी नीतिमत्तेचा आणि आत्मत्यागाचा केवळ पुतळा असा रंगविलेला आहे. त्या रंगवटीला अनुसरूनच, रामायण-लेखकानें खालच्या सारखे त्याचें चित्र रंगविलें असते, तर किती तरी चांगलें झालें असतें? अयोध्येच्या लोकांनी सीतेच्या पावित्र्याबद्दल शंका घेतांच, रामाने ताबडतोब एक जंगी दरबार भरऊन लोकांना जाहीर रीतीने सांगायचे होतें कीं, "नागरीक जनहो, तुम्हाला माझ्या महाराणीबद्दल कांहीं संशय येत आहे. माझ्या बरोबर सिंहासनी तिनें बसूं नये, असें तुम्हाला वाटत आहे काय? ठीक आहे. तर मग मला या राज्याचीच पर्वा नाही. आत्ताच्या आतां राज्यसूत्रें भरताच्या स्वाधीन करून सीतेसह मीच अरण्यावासाचा रस्ता पत्करतो. तुमचा संशय कांहींहि असता तरी सीतेच्या पावित्र्याबद्दल माझी बालंबाल खात्री झालेली आहे. मला इतरांच्या कुटाळक्यांकडे लक्ष देण्याचे मुळींच कारण नाही. प्रजाजनहो नीट विचार करा. सीतादेवी माझी वाग्दत्त विवाहबद्ध पत्नी आहे. ती पूर्ण दिवसाची गर्भवति असून, लवकरच तिला मातृपद प्राप्त होणार आहे. अशा अवस्थेत केवळ तुमच्या संशयाच्या लहरीचें रंजन करण्यासाठी मी जर तिचा त्याग करीन तर राक्षसांत आणि माझ्यांत फरक तो काय? मी जसा तुमचा राजा आहे, तसा सीतेचाहि राजा आहे. तुमच्या प्रमाणेच तिनेहिं जर न्यायाची मागणी केली. तर या नात्यानें कोणत्या तोंडाने मला ती नाकारता येईल सांगा. मी जर ही तिची न्यायाची मागणीच मान्य केली नाहीं, तर राजपदालाच काय पण माणुसकीलाहि मी नालायक ठरेन."
अशा तऱ्हेने रामाची भूमिका जर रंगविली असती, तर रामायणांतला राम आमच्या हिंदु राष्ट्राचा एक नमुनेदार पुरुषोत्तम (हीरो) म्हणून खास शोभून दिसला नसता काय?
लक्ष्मणाचीही मोठी स्तुति गाण्यांत येते. का? तर म्हणे रावणाची बहीण जी शूर्पनखा, तिनें लक्ष्मणाशीं प्रेमाचा लघळपणा केला म्हणून त्यानें तिचे नाक कान छाटले. या गोष्टीचा आमच्या तरुणांच्या मनांवर किती घाणेरडा विकृत परिणाम होत असतो, याची कोणाला कल्पना तरी आहे काय? शूर्पनखेनें स्त्रीस्वभावानुसार कितीहि लघळपणा केला, तरी लक्ष्मणाला त्या स्त्रींशी सौजन्याने दयाळूपणाने व दिलदारपणाने खास वागतां आलें असतें. वाटेल त्या क्षुद्र कारणावरून बायकांची नाके कापणे, किंवा इतर रीतीने त्यांना विद्रुप करणे, हा हिंदु पुरुषाचा मर्दपणा एकंदरीत बराच प्राचीन लौकिकाचा आहे.
हेंचसें काय, पण बायकांना पशूप्रमाणे क्रुर रीतीनें वागविण्याच्या हिंदु पुरुषांच्या बऱ्याचशा दुष्ट चालींचा उगम, आदर्श म्हणून डंका पिटलेल्या या राम लक्ष्मणाच्या जोडीच्या चरित्रचित्रांतच सांपडतो. उत्तररामचरित्राच्या शेवटी लक्ष्मणाबद्दल एक दुःखद गोष्ट वर्णन केलेली आहे. राम कोणातरी एका तिऱ्हाइताशी एकांतांत बोलत बसला होता. राज्यकारभाराच्या कांहीं महत्त्वाच्या गोष्टीबद्दल लक्ष्मणाला भेट घ्यायची होती. भानगड तर मोठी जरूरीची. क्षणाचाहि विलंब नको होता. म्हणून लक्ष्मण तसाच आंत गेला झालें. रामरायाचा एकांत बिघडला. लक्ष्मणाने केलेल्या या भयंकर अपराधाबद्दल त्याला शिक्षा ठोठावण्यांत आली की, `मरेपर्यंत पुन्हा मला तोंड दाखऊं नकोस.`
रामासाठी सारा जन्म लक्ष्मणानें जें अकृत्रिम बंधुप्रेम व भक्तीची निस्सीम सेवा केली, ती निमिर्षांधात क्षुल्लक गैरसमजासाठीं चुलीत गेली! या असल्या `पवित्र` उदाहरणांचा परिणाम हिंदु समाजावर कसा झाला व होत आहे, हें पाह्यचें असेल तर जरा हायकोर्टांच्या आणि स्मॉल कॉजेस कोर्टांच्या खटलेबाजीकडे लक्ष द्या. वडिलार्जित इस्टेटीच्या तुकड्यांसाठी एकमेकांच्या उरावर बसणाऱ्या शेंकडों राम लक्ष्मणांच्या जोड्या तेथें तुम्हांला भेटतील.
पूर्वी पेक्षा अलीकडे भावाभावांमधील प्रेमाला व आदराला सपशेल ओहटी लागलेली आहे. कोणी आपल्या नाकावर माशी बसून देईल तर हराम! सहिष्णुता आजकाल भरंसाट महाग झाली आहे. क्षुल्लक का कारण असे ना, यांची कुतरभांड कोर्टापर्यंत गेलीच पाहिजे, भाऊबंदकीच्या खटल्यांत न्याय देण्याचे काम सुद्धां मोठे कठीण होऊन बसले आहे. पुढे आणलेल्या पुराव्यांवर खोट्याची व खोडसाळपणाची इतकी दाट कवचें असतात की सत्यशोधनासाठी न्यायाधीशाला फार खोल विचार करावा लागतो. सन १८५८ साली युनिव्हरसिट्यांची आमच्या देशांत स्थापना होऊन तरुणांना उच्च शिक्षणाची खैरात सुरू झाली. तेव्हांपासून हा क्रम एकसारखा अव्याहत सुरू आहेत. पण त्या उच्च ज्ञानाचा किंवा त्या लांबलांब पदव्यांचा परिणाम आमचा स्वभाव उमदा दिलदार बनविण्यांत किंवा आमच्या अंत:करणांत सत्याची चाड पेरण्यांत झाला असेल तर हराम! हिंदु राष्ट्राचा अधःपात झाला आहे, हिंदु लोकांची दानत आरपार बिघडली आहे, हा सर्व बाजूंनी ऐकू येत असलेला आरोप अक्षरश: खरा आहे.
प्राचीन काळच्या चिनी आणि ग्रीक फिरस्त्यांनी आम्हा हिंदुंना सचोटी प्रामाणिकपणा आणि इमान यांच्या उत्कृष्टपणाबद्दल फार वाखाणणीची सर्टिफिकीटें दिलेली आहेत खरी. पण आज त्यांचे काय? आज या तीनहि बाबतीत आमचें सपशेल दिवाळे वाजलेलें आहे आणि या शोचनीय अधःपाताचे मूळ आमच्या तरुणांना मिळत असलेल्या युनिव्हरसिटीच्या शिक्षणांतच सांपडते.
न्यायमंदिरांत येणाऱ्या खटल्यांत, मग तो दिवाणी असो वा फौजदारी असो, प्रत्येक वेळी खोटे साक्षीदार पुढे उभे करण्यांत येत असतात. आणि असल्या खोट्या कज्जांची तरफदारी, खोटे दस्तऐवज, खोटे हिशेब यांच्या जोरावर हरहमेश करण्याची प्रवृत्ती आमच्या लोकांत स्वभावतःच दिसून येऊ लागली आहे. एके काळी सच्चे आणि उदार म्हणून नावाजलेल्या आम्हां हिंदुंचा हा लाजीरवाणा अधःपात मोठ्या कष्टानें कां होईना, पण कबूल करणें भाग आहे.
****
भाग ४
तरण्याताठ्या नावडत्या बायकांच्या लुगड्यांवर घासलेट तेल ओतून त्यांना पेटवून जाळण्याचा एक नवीन टापटिपीचा प्रघात हिंदुजनांत अलीकडे सुरू झाला आहे. या मुळे त्या बिचारीच्या लग्नांत तिच्या आंगावर बापाकडून मिळालेले दागदागीने त्यांच्या आयते पदरांत पडतात. कायद्याचें कचाट टाळण्यासाठी आणि पोलीसांच्या डोळ्यांत धूळ भरण्यासाठी आत्महत्त्येची सबब पुढे करून, आपण जरा जोरदार चौपदरी गळा काढला की काम भागले. हा बायका मारण्याचा धंदा एकदा दोनदा तीनदाहि करायला `नवरा सासरा सासू कंपू`ला कसलीच दिक्कत किंवा शरम वाटत नाही. उलट, इरसाल दिवाळखोर बनियाप्रमाणे हा नक्राश्रु ढाळणारा हलकट कंपू लग्नसराईत आपल्या ध्यायला चवथ्यांदा उजवून घ्यायला गळ्यांत हुंड्याची चिठ्ठी बांधून तयारच! प्रत्येक लग्नसराईत यांची तिजोरी गडगंज भरतच असते.
निपुत्रिक विधवा बहिणी आणि निपुत्रिक विधवा मेहुण्या यांच्यापाशी असेल नसेल तें खरवडून खाण्याचा आणि त्यांच्या हाती अखेर नरवंटी देण्याचा संभावीत धंदा करणारे भाऊ व मेव्हणे या हिंदुस्थानांत किती आहेत, हें वकिलीचा धंदा करणाऱ्या बहुतेक सर्व कज्जेदलालांना पूर्ण माहीत असते.
इरसाल बिलंदर डोकेबाजांनी नेहमींच बावळट श्रीमंत प्राण्यांच्या जीवावर आपली तुंबडी भरावी, असा जगाच्या व्यवहारांत एक ठरावीक नियम असावा, असे मला वाटतें. अपवादात्मक कांही थोंडी उदाहरणे असतील; नाही असे नाही. पण ती जमेला धरण्यांत अर्थ नाहीं. साधारणतः या बिलंदर डोकेबाजांच्या वर्गांत आमच्या सुशिक्षित मंडळींचा समावेश होतो, आणि दुसऱ्या बावळट वर्गांत सर्व पडदानशीन बायाबापड्यांचा-किंबहुना अखिल स्त्रीवर्गाचा समावेश होतो. हो दुसरा वर्ग जात्याच अत्यंत त्यागी, दिलदार मनाचा, सुचरित, गोड स्वभावाचा, पण अशिक्षित, विवेकहीन, कर्मठ आणि कमालीचा धर्मभोळा असतो.
आमचा स्त्रीवर्ग त्यागी दिलदार सुचरित आणि गोड स्वभावाचा अझून आहे. म्हणूनच हिंदु-भारताचा कारभार सध्यां कसाबसा टिकाव धरून राहिला आहे.
आमच्या संस्कृतीचा थोडा बहुत अभिमान बाळगण्याला जर कोठें काहीं जागा असेल, तर त्याचें सर्व श्रेय आमच्या स्त्रीवर्गाच्या या साधुवृत्ति सद्गुणांनाच दिलें पाहिजे. समाज आणि संस्कृती कसाला लावण्याच्या वेळी पुरुषांपेक्षां स्त्रियांचेंच महत्त्व विचारांत घ्यावें लागतें.
पण या बदमाश जगांत, स्त्रियांचा आत्यंतिक त्यागीपणा, कमालीची साधुवृत्ती आणि हृदयाची माधुरी इत्यादि सद्गुणांचा हिंदु पुरुषवर्गावर मात्र उलटा विपरित परिणाम घडत असतो. स्त्रियांच्या सर्व स्वर्गतुल्य गुणराशीमुळे आम्ही पुरुष मात्र अट्टल स्वार्थी, पिसपिशीत मनाचे आणि नामर्द वृत्तीचे बनलो आहों.
आमच्यांतील अविभक्त कुटुंब पद्धतीमुळेच स्त्रियांच्या या सर्व सद्गुणांना वांव मिळून त्यांचा सुंदर परिपोष झालेला आहे. या ठिकाणी त्यांचाच शब्द सारा संसार-कारभार चालवीत असतो. त्यांच्या विरुद्ध फारसे कोणी जात नाहीं. सर्व कुटुंब एकत्रच असल्यामुळे, निरनिराळ्या व्यक्तींवरच्या त्यांच्या निसर्गजात प्रेमाचा इतका सुंदर विकास झालेला दृष्टीस पडतो की, तसलें अकृत्रिम प्रेम जगांतल्या कोठल्याहि देशांत पहावयाला मिळणार नाहीं
अविभक्त हिंदु कुटुंबातील गृहिणीच्या या नितांत मधुर प्रेंमाचें आणि तिच्या सेवाधर्माचे खरे स्वरूप पहावयाचे असेल, तर ती गृहव्यवस्थेच्या नानाविध प्रकारांत मग्न असताना नजर टाका, म्हणजे झालें. ती अशिक्षित असली, शाळांतील इतिहास भूगोल गणितादि विषयांचा तिला वाराहि लागलेला नसला, तरी ही गृहराज्ञी संसाराच्या खर्चवेचांत काटकसरींत, हिशोबाठिशोबांत देण्याघेण्यांत कमाल धोरणी व वाकबगार असते.
तिचे लक्ष सर्वांवर आणि सगळीकडें सबसारखे असते. स्वयंपाकाची व इतर सर्व भांडीकुंडी घासून पुसून स्वच्छ ठेवणें, खोल्या झाडून सारवून स्वच्छ ठेवणे. ओसऱ्या पायऱ्यांवर कणारांगेळ्या काढून त्या सुशोभित करणे. दूधदुभत्याची व्यवस्था ठेवून, त्याची वाटणी करणें, मुलांबाळांच्या न्याहारीचा लवेदा आटपणें, बाजार येईल त्या प्रमाणे जेवणाचा बातबेत ठरविणे. आचारी किंवा स्वयंपाकीण असेल तर डाळ, तांदूळ, कणिक, भाजीपाला वगैरे जिन्नस साफसूफ करून चिरून निवडून व्यवस्थित प्रमाणांत तिच्या हवाली करणे, पाकसिद्धीवर वरचेवर लक्ष देणे, मुलाबाळांच्या आंघोळी, त्यांचे कपडेलत्ते, त्यांची जेवणेंखाणे आटपून त्यांची शाळेत रवानगी करणे, हायस्कूल कॉलेजांत जाणाऱ्या तरुणांचीहि इतकीच बडदास्त ठेवणें. ही कामे उरकतात न उरकतात तोच ऑफिसांत जाणाऱ्या मोठ्या मंडळींची गडबड सुरू होते. यांत मामांजी, पतिराज, दीर, काके दीर, एखादा घरजांवई पाहुणाराहुणा माssरे सगळ्यांची एकदम धामधूम उडते. त्या सर्वांची यथसांग भोजन पानसुपारी पर्यंत बोळवण करतां करतां दहाचा टोला पडतो. दहाच्या आंत या सर्व भानगडी तिला आटपाव्याच लागतात.
साडे दहाला शाळा कॉलेज ऑफिसांतली मंडळी जिकडच्या तिकडे निघून गेली की, बिचारीला क्षणभर हुःश करायला मिळतें न मिळते, तोच गडीमाणसांच्या जेवणाची व्यवस्था दत्त म्हणून पुढे उभीच. हें काम आटोपतांच मुलांना व मोठ्या माणसांना शाळा कॉलेज ऑफिसांत पाठविण्याच्या टिफीनची लगबग सुरू होते. यांतून ती थोडी मोकळी होते तो शाळेतून परत येणाऱ्या मुलांसाठी भूकलाडू तहानलाडूची व्यवस्था पहावी लागते. बरें हे `बाळवाटी` वाले बाबालोक एकत्र एकदम तरी घरी येतात? कोणी ४ वाजतां, कोणी ४|| वाजतां आणि कांही ५ वाजता. आला की वाढ, खरकटें काढ! असा सारखा धुडगूस चालूं.
नोकरा चाकरांची दुपारची जेवणे, मुलांच्या टिफिणी यांतच बारा वाजेपर्यंत गृहिणीचा वेळ जातो. लागलीच ती आचारणींशी रात्रीच्या जेवणाचा बातबेत ठरऊन त्याप्रमाणे सामानसुमानाच्या व्यवस्थेला लागते. त्यांतच नोकराचाकरांची भांडणे, त्यांच्या घरांकडल्या सुखदुःखाच्या बातम्या, या भानगडीच ती निवरानिवर करते. देवघरांत देवास दोन फुलं वाहून, या माऊलीच्या पोटांत दोन घास जाईपर्यंत दोन वाजतात.
या शिवाय भिकारी भिक्षुक फकीर यांची वर्दळ सारखी असायचीच. कोणाला मूठभर तांदूळ, तर कोणाला पै पैसा ती देतच असते. कोणी विन्मुख परत जाईल हे व्हायचेच नाही. इतक्या नानाविध भानगडींत ती गुंतलेली असली, तरी तिची चाणाक्ष नजर सगळीकडे करड्या कदरीने फिरत असतेच. आचारीण किंवा एखादा नोकर घोटभर दुध चिमुटभर साखर किंवा कवळाभर सरपण चोरूं म्हणेल, तर तें कधींच शक्य नाहीं.
काय तिला थोडीशी विश्रांति मिळायची तर ती तीन चारच्या दरम्यान, पण या वेळीहि शिवण टिपण हीं कामें तिच्या मागें असतातच. चाराचा ठोका पडला की शाळेतील व कॉलेजांतील मुलें परत येऊ लागतात. त्यांच्या फराळापासून सुरवात झाली की रात्रीची जेवण आटपेपर्यंत तिच्या कामाचा रगाडा चाललेला असतोच. रात्री १० वाजेपर्यंत सर्वांची जेवणें आटोपल्यावर ती आपल्या जेवणाची व्यवस्था पहाते. एवढ्या अवकाशांत तिच्या पतिराजाचे जेवण वगैरे होऊन, त्यांच्या निजण्याची, पानसुपारीची सगळी व्यवस्था ती व्यवस्थित लावते. कांही कमी अधिक असेल त्याची व इतर संसारी बाबींची चर्चा करते.
जेवण्याच्या संबंधांत हिंदुंचें घर म्हणजे शुद्ध उपाहारगृह किंवा खाणावळ म्हटलें तरी चालेल. उपाहारगृहांत ज्याप्रमाणे दुकान उघडें आहे तोपर्यंत केव्हाहि यावे आणि खाऊन जावें, त्याप्रमाणे आमच्या घरांत प्रकार चाललेला असतो. जेवण्याची एक निश्चित वेळ आहे आणि वेळेवर बाहेरून येऊन सर्व हजर राहतील, ही गोष्टच नको. मग पुरुषपणा तो कोठें राहिला? केव्हांहि यावें आणि जेवावें असा पंक्तीचा प्रकार येथें चाललेला असतो.
जी पुरुष मंडळी सकाळच्या जेवणाकरितां नियमितपणाचा अगदीं थैमान घालतात. तीच मंडळी संध्याकाळच्या वेळेबद्दल अगदीच बेफिकीर असतात. कुटुंबांतील सर्वजण एकत्र एकदम जेवतील असा योग दुर्लभच. प्रत्येक जणाची वेळ निराळी आणि त्या वेळेला या राजेश्रींची बरदास्त ही राहिलीच पाहिजे. पण असल्या गोष्टीनीं घरांतल्या बायकांना काय त्रास पडतो याची ते यत्किंचितही जाणीव राखण्याच्या भानगडीत पडत नाहींत.
अविभक्त हिंदु कुटुंबांतलें हे गृहव्यवस्थेचे चित्र जरा विशेष तपशिलानें रंगविण्यांत, मूळ विषयापासून मी थोड़ा बाजूला गेलो, असें आपणांस वाटत असेल. पण यावरून तुम्हाला स्पष्ट दिसून येईल की, असल्या या पद्धतीमुळे बायका म्हणजे कामाची निवळ यंत्रें तर बनतातच, पण कुटुंबांतल्या कुटुंबांत पुरुषांच्या, विशेषतः तरुण मुलांच्या मनोवृत्ती दिवसेंदिवस बदलत्या काळाबरोबर कशा बदलत आहेत, याचा अदमास घेण्यासहि त्यांना वेळ सांपडत नाहीं.
एक दोन वर्षे शाळेंत जाऊ लागून झालीं कीं, मुलांना ताबडतोब कल्पना येते कीं, आपली आई वगैरे बायकामंडळी अशिक्षित आहेत, आणि त्यांना आपण शिकत असलेले धडेहि समाजवून सांगतां येत नाही. ही कल्पना एकदा का मुलांच्या मनांत रुजूं लागली की, त्यांच्या मनांत या स्त्रीजनांबद्दल एक प्रकारची बौद्धिक तिरस्कारांची भावना उत्पन्न होऊ लागते. आणि आईचा त्यांच्या वरचा दाब हळू हळू नाहींसा होण्याच्या पंथाला लागतो. याचा परिणाम अगदी उघड आहे. हे मुलगे शरीराने मारे चांगले दही, दूध, तूप, खाऊन पोसले जातात. पण मनाची खरी जोपासना होण्यास मातांच्या आत्मिक तेजांचें टॉनिक लागते तें त्यांना, त्यांच्या माता वर निर्दिष्ट केलेल्या बहुमोल गुणांनी विभूषित असतांही, मुळींच मिळत नाही.
आपल्या आयांच्या अशिक्षितपणाबद्दल हळूहळू न कळत उत्पन्न होणारा हा तिरस्कारभाव एकंदर स्त्रियांच्या विषयीं मुलांच्या मनाची ठेवणच बिघडवून टाकतो. एकंदर स्त्रीजातीविषयीं लहानपणीच त्यांची कल्पना विकृत होते. ते त्यांना आपल्यापेक्षा प्रत्येक बाबतीत बेअक्कल समजून क्षुद्र लेखू लागतात.
आईला आपल्या अशिक्षितपणाची जाणीव असल्यामुळे ती आपल्या सुशिक्षित बनूं पहाणाऱ्या चिरंजीवांना कोणत्याच बाबतींत बोलत नाहीं. आणि अशा रीतीने दोघांची बौद्धिक फारकत दिवसेंदिवस जास्तजास्तच होत जाते. बाप काय?-तो रात्रंदिवस आपल्या धंद्यांत आणि कामकाजांत इतका गढून गेलेला असतो की, मुलांच्या मनोभूमिकेच्या ठेवणीसारख्या गोष्टीकडे लक्ष पुरविण्यास त्याला फुरसतच सांपडत नाहीं. आणि त्यामुळे बापलेकांमध्ये संघटनहि बेताबाताचेंच राहतें. हळूहळू मुलगेहि बापाशीं केव्हांहि मनमोकळेपणाने बोलण्यास संकोचतात.
दिवाणखान्यांत जेथें बापाची चार मित्रमंडळी जमून गप्पा वगैरे चालतात, तेथें कोणत्या विषयावर बोलावे आणि बोलू नये, याचा त्यांना कांहीं घरबंदच नसतो. स्त्रियांच्या विषयीं थट्टास्पद उद्गार किंवा वाटेल त्या चवचाल घाणेरड्या गप्पा खुशाल मनमुरादपणें तेथें चालत असतात. हे सर्व गप्पाष्टकांचे अड्डे चालत असतां लहान मुलें तेथेंच वावरत असतात. त्यांच्या कानांवर या गोष्टी पडतात आणि मग लहान वयांतच ती कळू नये त्या गोष्टींत तरबेज होऊन, वाटेल त्या अवास्तव फाजील गोष्टी बडबडणारी बनल्यास नवल ते काय?
आपले आईबाप एकत्र बसले आहेत. एखादें चांगलेसे पुस्तक वाचीत आहेत. त्यांतील विषयासंबंधी चर्चा करीत आहेत. असला देखावा मुलांच्या दृष्टीस क्वचितच पडतो. आईबापांची भांडणे धुसपुस ही त्यांच्या नित्य पहाण्यांतली गोष्ट. आईविषयीं बापानें काढलेले अनुदार उद्गार, तिच्या मठ्ठ डोक्याची हेटाळणी, वाटेल त्या शब्दांनी केलेली तिची निर्भत्सना, हीं नित्यशः दृष्टीस पडावयाची. हा अकाल प्रौढपणा, म्हणजे भलत्या वयांत भलत्याच गोष्टी शिकण्याचा या मुलांचा आणखीहि एक मार्ग असतो. तो म्हणजे घरांत लग्न होऊन आलेल्या समवयी पण प्रौढ बहिणी आणि कॉलेजात शेफारलेल्या व रेनॉल्डच्या कादंबऱ्यांचा घोट्या मारणाऱ्या त्यांच्या पतिराजांकडून त्यांनी शिकलेल्या फाजील गोष्टी ऐकण्याचा!
अविभक्त कुटुंब-व्यवस्थेंत मुलांना खरे गृहजीवन किंवा खरे गृहशिक्षण मुळींच मिळत नाही. इतकेंच नव्हे तर, गृहजीवन म्हणजे काय, याची त्यांना कांही कल्पनाच होत नाहीं. याचा परिणाम त्यांच्या भावी जीवनचर्येवर फार वाईट होतो. हाच महत्त्वाचा मुद्दा या एवढ्या निरूपणाने मला तुमच्या नजरेस आणावयाचा आहे.
खरे पाहिले तर मुलांना गृहजीवनाचे अमृत आईच देऊ शकते. `हें घर माझें आहे` ही जाणीव तीच देऊ शकते. गृहसंसाराला लागणारा पैसा बाप कितीहि मिळवो, तें काम त्याचें नव्हे. ते सामर्थ्य आईचेंच. कोवळ्या वयात मनोवृत्ती इतकी मृदु असते की, तिला वाटेल तो आकार देता येतो. त्या वयांत जर मुलांच्या मनावर आईचा दाब नसेल, तर केवढी हानी त्यापासून होईल याची कल्पनाच करणे बरें.
हिंदुचे एखादें घर घ्या, नाहीतर सारा हिंदुसमाज घ्या, आमच्या रोजच्या राहणीत धार्मिक बुरख्याखाली शेकडों फोलकट आचार विचारांचा सुळसुळाट सारखा चालू असतो. त्यांतला दांभिकपणा आम्हांला कळो न कळो, पण विचाराला पटेल असें त्या धार्मिकब्रुव आचारांत कांहींच नसतें. केवळ मढ्यांची उलथापालथ! या फापटपसाऱ्याच्या बजबजपुरीचा परिणाम आमच्या मनोवृत्तीवर व वर्तमानावर फारच विपरीत झालेला आहे. देण्याघेण्याचा किंवा कसलाहि व्यवहार असो, "आपणांशी इतरांनी जसे वागावें अशी आपली अपेक्षा असते, तसेंच आपणहि त्यांच्याशीं, सख्या भावाच्या भावनेनें, निदान माणुसकीच्या भावनेनें तरी, वागले पाहिजे" हें वर्तन-नीतींतलें मुख्य तत्त्व बेगुमानपणे लाथाडण्यांत आम्हांला कांहींच वाटेनासे झाले आहे.
फावड्यानें पैसा ओढणाऱ्या इरसाल डामरट लोकांच्या धंद्याला समाजामध्ये दोन प्रकारच्या लोकांची मदत होत असते. एक हावरा आणि दुसरा गरजू. हे दोनहि प्रकारचे लोक अगदीच अशिक्षित असतात असें नव्हें, चांगले सुशिक्षित असतात. पण, शिक्षणाचा उपयोग कांहीं तरी उच्च उदात्त गोष्टींच्या प्राप्तीसाठी असतो, ही कल्पनाच त्यांना भासमान होत नाहीं. त्यांना शिक्षण म्हणजे, आपल्याच गरीब बांधवांचे गळे सफाईत कापणारा वस्तराच वाटतो. ही उपमा किंचित् स्पष्ट करून सांगायची तर असें स्वच्छ म्हणतां येईल की कायद्याच्या कचाटीत न सांपडतां लोकांना सफाईनें नागविण्याचाच ते धंदा करीत असतात.
गृहजीवन आणि त्याचा मुलांबाळांवर व मोठ्या माणसांवर होणाऱ्या योग्य व सात्विक परिणामाच्या उणीवेमुळें आजच्या हिंदु समाजाची नीतिमत्ता पार नासून गेली आहे; आणि चालला आहे तो प्रकार जर असाच बिनअटकाव चालूं राहील, तर हिंदु समाजाच्या अधःपाताचे स्वरूप आहे त्यापेक्षां खास अधिक भेसूर बनल्याशिवाय राहणार नाही. स्त्रियांच्या-मातांच्या-घरगुती कष्टांचे नुसते पोवाडे गाऊन हा अधःपात थांबणार नाही. त्यांचा आत्मिक प्रभाव वाढविण्यासाठी त्यांना शिक्षणाची जोड करून दिली पाहिजे. घर स्वच्छ ठेवणाऱ्या तिच्या हातांतील केरसुणींचे महात्म्य कवींनी वर्णिलें आहे. वर निर्देशिल्याप्रमाणे तिला खरी माता होऊ द्या. ती घरच काय, पण त्याबरोबर त्यांतील माणसांची मनेहि स्वच्छ ठेवण्यास समर्थ होईल. आणि मग स्त्रीला `भयचकित तिज नमावें` असलें तिचें खरें दैवी स्वरूप प्राप्त होईल.
सध्या तर, आमच्या हाडींमासीं खिळलेल्या शेंकडों परस्परविरुद्ध पंथपक्षभेदाच्या ध्येयांनी व कल्पनांनी आमच्या अपकर्षाचा वेग विशेष वाढत चालला आहे. उदाहरणार्थ, वैष्णवांचा `अवतार` पंथ पहा. हा पंथ किती अनावश्यक अविवेकी आणि सर्वथैव असमंजसपणाचा आहे, हे स्वामी दयानंद सरस्वतीसारख्या अनेक विद्वान पंडिताग्रणीनी हडसून खडसून सिद्ध केलेले आहे.
या `अवतार` कल्पनेचा पुरस्कार करण्यासाठी वैष्णव लोक कशाकशाचा आधार घेतील आणि कसकसल्या गोष्टींचें समर्थन करतील. याचा कांहीं धरबंधच उरलेला नाहीं. भक्ती अथवा प्रेम यांच्याद्वारें सगुणोपासनेच्या तत्त्वांची, वेदान्तांतील आध्यात्मिक तत्त्वांशी सांगड घालतांना वैष्णवांनी विवेकाच्याहि पार पलीकडे उडी घेण्यास कमी केलेले नाही. त्यांनी त्रैमूर्तीपैकीं विष्णूला निवडून, युगायुगाच्या ठायीं त्याला अवतार घेण्याला भाग पाडलें आहे.
श्रीमद्भागवत हा आम्हा हिंदुंचा मोठा पवित्र ग्रंथ. वैष्णवांची ही `अवतार` कल्पना त्यांतील विचारांशी जुळती मानणें, म्हणजे आम्ही अकलेचे निवळ खंदक आहों, अशी कबुली देण्याइतकेंच मूर्खपणाचे होईल. तथापि, ज्या एक अगर अनेक लेखकांनी हा महाग्रंथ लोकांच्या फायद्यासाठी किंवा त्यांना मूर्ख बनविण्यासाठी एवढ्या परिश्रमानें लिहिला, त्या लेखकाच्या अथवा लेखकांच्या हिंदु समाजाच्या मनोवृत्ती व प्रवृत्तीबद्दल काय काय कल्पना असाव्या, एवढे मात्र फार छान समजते. या ग्रंथांतील तत्त्वज्ञानांचें सार एखाद्या लहान मुलालाहि समजेल इतकें सोपें आहे. तें हेंच की परमेश्वर प्रेमाची खाण आहे.
महाभारत पाहिले तर वैष्णव पंथाचा नायक श्रीकृष्ण म्हणजे एक कट्टा राजकारणी मुत्सद्दी दिसतो. महाभारतीय महायुद्धांतील युद्धमान दोनहि पक्षांचा तो जवळचा नातेवाईक होता. युद्ध हें झालेंच पाहिजे अशी त्याची अगदी मनापासून इच्छा होती. भ्रांतीनें गांगरलेल्या अर्जुनाला त्यानें जो गीतारूपी उपदेश केला तो हाच कीं, ईश्वराच्या इच्छेचें तूं एक कळसूत्री बाहुलें आहेस; केवळ निमित्त मात्र होऊन तूं या कौरवांचा संहार कर. हाण, बेलाशक हाण; मागेंपुढे मुळींच पाहू नकोस. या संहाराच्या बाबतीत तुला आवडीनिवडीची किंवा पसंती नापंसतीची मुळीं सवलतच नाही. ईश्वराने तुझ्या शत्रूंना आधींच मृत्युक्षम करून टाकलेले आहे. फक्त लौकिकी दृष्टीनें निमित्तमात्र होऊन तूं यांचा संहार कर. म्हणजे झाले.
अर्जुन ज्या मनोवृत्तीत होता, तिला श्रीकृष्णानें काय उपदेश केला? निष्काम होऊन विहित कर्तव्य कर. निरीच्छ भावनेनें, फळाची आशा न धरतां, आपण केवळ ईश्वरी इच्छेचें कळसूत्री बाहुलें-निमित्तमात्र कारण आहोंत या बुद्धीनें कर्तव्य कर. यालाच `निष्काम धर्म` असे म्हणतात. भगवद्गीतेत याच तत्त्वावर विशेष भर आहे. परमेश्वर म्हणजे निष्करुण न्यायदेवता. उत्क्रांतीचक्रांत आपल्या इच्छामात्रें करून दुष्टांचा बिनचुक संहार आणि सुष्टांचा उद्धार करणारी शक्ती. या कामी मनुष्याच्या युक्त्याप्रयुक्त्या कुचकामी आहेत. मनुष्य कितीहि आणि केवढाहि युक्तीबाज आणि महत्त्वाकांक्षी असला, तरी परमेश्वरी जबदरस्त सूत्रांपुढे तो दर्यामें खसखस होय.
ईश्वरी इच्छेचा एक निमित्तमात्र कारण, यापेक्षां मनुष्याच्या हाती कसलीहि सत्ता नाहीं, त्याच्या हातून काही होणेंहि नाहीं, ही श्रीमद्भगवत् गीतेतील निष्काम धर्माची व्याख्या जितकी न्याय निष्ठूर आहे, तितकीच उत्साहवर्धक आणि कोणत्याहि समाजाच्या आत्मिक वृत्तीच्या उत्कर्षाला शोभून दिसणारी आहे. याच्या उलट `ईश्वर प्रेममय आहे` या तत्वावर भक्तीपंथाची भरसाट पुढें चढविलेलेली भागवतांतील माथेफिरू विचारसरणी पहा.
हिंदु समाजाची मनोवृत्ती आणि तिच्यांत बोकाळलेला भरंसाट बेतालपणा, यांचा आपणास नीट चिकित्सापूर्वक अभ्यास करायचा असेल, तर गीता आणि भागवत या दोन हिंदु-बायबलांचा आपणांस नीट परिचय करून घेतला पाहिजे. या दोन ग्रंथांतील विचारांचे आमच्या स्वभावावर व शीलावर झालेले परिणाम अभ्यासणें फार महत्त्वाचें असल्यामुळेंच मी हा मुद्दा विचारार्थ मुद्दाम घेतला आहे.
भारतीय महायुद्धाचा बातबेत ठरविण्याच्या कामीं श्रीकृष्णाला पांडवमाता कुंति आणि पांडवपत्नी द्रोपदी यांचें सहाय होतें.
या महायुद्धांत बहुतेक सर्व क्षत्रिय राजांचा संहार झाला. त्यामुळें परचक्रांपासून हिंदुस्थानचें संरक्षण करणारी मुख्य शक्तीच पार नाहीशी झाली. त्याचें परिणामहि फार भयंकर झाले. जगाच्या इतिहासांत दुसरी तोड आढळणार नाहीं. अशा ऱ्हासाच्या आणि अधःपाताच्या फेऱ्यांत हा देश सांपडला.
ऱ्हासाला आणि अधःपाताला थोपविण्याचा कौतुकास्पद परंतु अपयशी प्रयत्न बौद्ध व जैन धर्मपंथांनी केला. ब्राम्हणी धर्मानें पाशवी धुडगुसाच्या जोरावर आपला बोलबाला वाढविण्याची जी कारवाई केली, त्यांतच हिंदुस्थान ग्लानीनें गठाळला आणि अखेर ठार बुडाला. आजचा हिंदुस्थान म्हणजे थंडगार पडलेले नुसते मढें बनला आहे आणि या शोचनीय अवस्थेची सर्व जबाबदारी भिक्षुकशाहीच्याच माथ्यावर आहे.
असो. सध्या थोडा वेळ आपण हिंदु-भारताचा अत्यंत प्रिय असलेल्या पुरुषोत्तम श्रीकृष्णाकडे वळू या. भारतीय महायुद्धाच्या कत्तलीची सुरुवात होण्यापूर्वी सारथी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश केला, तो भगवद्गीता नांवानें महाभारतांत आढळतो.
निरनिराळ्या योगपद्धतींचा उत्कृष्ट समन्वय आणि निष्काम धर्माचा उपदेश करणारा हा थोर महत्त्वाचा गीता-भाग जर महाभारतापासून निराळा काढला, तर तेवढ्यानें त्याचें किंवा खुद्द महाभारताचे महत्त्व रतिमात्र कमी होण्यासारखें नाहीं. परंतु श्रीकृष्णानें गीतेचा उपदेश केला, एवढ्याच सबबीवर त्याला विष्णूचा अवतार मानण्याचें वास्तविक कांहीच कारण दिसत नाही.
वृंदावनांत गोपींच्या शृंगारविलासांत लोळणारा कृष्ण हाच महाभारतांतला श्रीकृष्ण, तोच अवतारी पुरुष, असें भागवताच्या खास शिकवणीनें सर्व हिंदु समाजास भासवून, वैष्णव लोक देशांतील अज्ञ लोकांच्या भोळसट भावनांवर आजपर्यंत वाटेल तसे चरत आहेत. पण आश्चर्याची गोष्ट हीच की खुद्द महाभारतात कृष्णाच्या वृंदावनी शृंगारीक जीवनाबद्दल एक अक्षराचाहि उल्लेख आढळत नाहीं.
हव्या त्या वेळी हवा त्याला ईश्वरी अवतार बनविण्याच्या फाजील संवयीचा परिणाम असा होतो की माणसांत माणुसकीचा अभाव तर सिद्ध होतोच, पण सारासार विचार आणि वस्तुस्थितीचा विवेकी ताळमेळ याचाहि धरबंध शिल्लक उरत नाही.
चालूं आयुष्यांत इहलोकीं आमच्या हाती असेल नसेल त्याची विल्हेवाट लावून, परलोकीच्या (काल्पनिक) सुखदायक गोष्टींचा ध्यास घेणें, म्हणजें हातचें सोडून पळत्याच्या मागें लागण्यासारखें आहे. पण आमच्या भिक्षुकशाहीची शिकवण पाहिली तर `हातचे सोडा आणि पळत्यासाठी जीव तोडा` हीच. असल्या शिकवणीमुळे वाटेल त्या राष्ट्राचा अधःपात व नाश झालाच पाहिजे. बुद्धी आरपार सडून, आमच्या पौरुषत्वाचेहि तीनतेरा उडाल्याशिवाय राहावयाचे नाहीत. ही शिकवण म्हणजे एक विलक्षण गुंगी आणणारें जहर आहे. या जहराच्या नात्यांत आमचें हिंदुराष्ट्र सांपडले आहे. यांतून सुटकेचा मार्ग काढण्याचा प्रत्येक प्रयत्न म्हणजे बुडत्याचा पाय खोलांत, अशी अवस्था झालेली आहे. कारण त्या जहराचा बाहेरून प्रतिकार करीत असतांनाच आजपर्यंत कळत नकळत आंगीं भिनलेल्या विषाचे घाणेरडे गॅस भसाभस आमच्या अंतरंगातून बाहेर पडत असतात आणि आंतून बाहेरून अशा दुबारी माऱ्यानें आमचा एकसारखा कोंडमारा होत असतो.
****
भाग ५
आंता आपण आपल्या काव्येतिहास (Epic) ग्रंथांकडे वळूं. या ग्रंथांनी आमच्या व विशेषतः स्त्रीवर्गाच्या धर्मभोळेपणाची कमान किती कमाल वांकविली आहे, याविषयीं काही मुद्द्यांकडे आतां लक्ष देऊ या. स्वतःच्या मनालाच खालील प्रश्न विचारा :-
(१) लंकेचा राजा रावण (रोमन लोकांनी कार्थेज येथल्या प्राचीन फिनीशियन संस्कृतीचा नाश केला; ग्रीक लोकांनीं ट्रोजन संस्कृती धुळीला मिळविली; तद्वतच वैदिक आर्यांनीं रसातळाला नेलेल्या एका जबरदस्त प्रतिस्पर्धी संस्कृतीचा रावण हा नायक प्रतिनिधी होता. -ग्रंथकार.) हा शिवाचा उपासक दाखविण्याची काय आवश्यकता होती?
(२) राम जर एवढा मोठा विष्णूचा अवतार होता, देव होता, तर त्याला हनुमानाच्या मदतीने रावणपत्नी मंदोदरीकडून, रावणाच्या आत्मसंरक्षणाची गुप्त अस्त्रें, लुच्चेगिरीनें आणि ठकबाजीनें साध्य करून घेण्याची काय जरूरी होती?
(३) रावणाचा शिलकी पुत्र व सेनानी इंद्रजित हा वैदिक अग्निदेवाचें पूजन करण्यात मग्न असतां, त्याचा वध करण्याचें लक्ष्मणाला काय प्रयोजन होते?
(४) आपल्या शस्त्रास्त्रांना विजय मिळावा म्हणून पाण्यात उभें राहून रामानें दुर्गापूजा उर्फ शक्तीपूजा केली ती काय म्हणून?
या शक्तीपूजनांच्या अनेक संदर्भांवरून, हा रामायण ग्रंथ कोणीतरी एखाद्या शाक्तपंथी संपादकानें, आपल्या पंथाच्या मतप्रसारार्थ आणि पूजाप्रसाराची जाहीरात देण्यासाठीच लिहिल्याचें नाहीं का तुम्हाला वाटत? विष्णूचा अवतार राम; तो शक्तीची पूजा करतो आणि त्यामुळे शैव रावण रसातळाला जातो! यावरून, शिवपेक्षां विष्णू श्रेष्ठ आणि विष्णूपेक्षा शक्ती श्रेष्ठ; त्याचप्रमाणें इतर देवदेवतांच्या पूजकांपेक्षा शक्तीच्या उपासकाचा-शाक्ताचा-अधिकार विशेष श्रेष्ठ व हुकमी फलदायी, एवढेंच त्या रामायण-लेखकाला नव्हते का दाखवावयाचे? आणि हें काम कल्पक व चलाख अशा एखाद्या शाक्तपंथी संपादकाशिवाय इतर कोणाला साधलें असतें? पंथभेदाचा सवतिमत्सर हा असाच असतो!
या असल्यास मत्सरी पंथभेदाचें `पॉलिटिक्स` (पॉलिटिक्स या इंग्रेजी शब्दाचा अर्थ केवळ `राजकारण` असा होत नाहीं. त्यांत मानवी जीवनचर्येच्या सर्व व्यवहारांचा समावेश होतो. म्हणून तोच शब्द येथें कायम ठेविला आहे. – अनुवादक.) प्राचीन हिंदुस्थानांत चालूं असें. त्या प्राचीन पॉलिटिक्सचें स्पिरीट (या शब्दालाहि तेज, तडफ वगैरे अनेक मराठी प्रतिशब्द असले, तरी स्पिरीट शब्दांतल्या सर्व भावना त्यांत उतरत नाहींत. सबब याचीहि शुद्धी करून मराठी संघटनांत त्याला घेतलें आहे. -अनुवादक.) आजहि आम्ही परदेशच्या सफरी करून परत आलेल्या आमच्या देशबांधवांवर बहिष्कार टाकण्याच्या कामीं भरपूर गाजऊन घेत असतो. आमच्या खेड्यापाड्यांतून हा `वाळीत टाकण्याचा` धंदा अगदी तेजीत असतो. मात्र एखादा श्रीमंतः शूद्र थोडा ढिल्या हाताचा असेल, तर त्यावर ही वाळीची घोरपड सहसा चढत नाही. तथापि आमचे सुप्रसिद्ध जीर्णमतवादी ब्राम्हण वैश्य (क्षत्रिय तर नाहीतच सध्या!) त्या उदार व श्रीमंत शूद्रांवर बहिष्कार टाकायला केव्हांही सोडायचे नाहीत. आजपर्यंत आमची धार्मिक सामाजिक जीवनचर्या या असल्याच मत्सरी पंथभेदांवर आणि पक्षभेदांवर चाललेली आहे. आम्ही `पार्टी पॉलिटिक्स` (पक्षभेदाळू राजकारण) खेळवायला नालायक आहोत, असे म्हणणाऱ्याला आम्ही कोण आहोत व कसे आहोत, याची मुळींच दाद नाहीं, असें म्हटलें पाहिजे.
वैष्णव पंथाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी सर्व हिंदुस्थानांत जिकडे तिकडे `इंद्र`पंथाचा प्रसार झालेला होता. वैष्णव सांप्रदायाने इंद्र सांप्रदायाला माजी टाकलें, ही गोष्ट सर्वश्रुतच आहे. वेरूळ येथील कोरीव लेणी आपण पाहिलीं ऐकली असतीलच. सबंध डोंगराचा कडाच्या कडा पोखरून, त्यांत मोठमोठे भव्य दिवाणखाने, हिंदु देवदेवतांची सुंदर चित्रे कणखर दगडात कोरलेली आहेत. ती इतकी प्रचंड भव्य प्रमाणबद्ध आणि सुंदर आहेत कीं जगांत दुसरी तोड नाहीं. इजिप्त येथील कोरीव कामें व पिरामीड हीं सुद्धा त्यांच्यापुढे खिसगणतीत नाहीत, असा अनेक ब्रिटीश चिकित्सकांचा अभिप्राय आहे. एवढे मोठे ग्रीस. पुतळ्यांच्या कोरणीत जगप्रसिद्ध. पण या लेण्यापुढे त्याचीहि ती कला फिकी पडते. या वेरूळ लेण्यांत जो एक प्रचंड दिवाणखाना आहे, त्यांत इंद्र व त्याचे इतर सहकारी यांचेच सर्वत्र पुतळे आहेत. तेथें श्रीकृष्ण किंवा विष्णू यांचें नांवहि नाही.
महाभारतांत श्रीकृष्णाला `अवतारी` दाखविला आहे. त्यानें आपले तोंड उघडून त्यात अर्जुनाला आपल्या विश्वरूपाचे दर्शन दिले. हा विश्वरूपदर्शनाचा प्रयोग कृष्णानें जर दुर्योधनावर केला असता, तर त्याच्या अवतारी तेजानें सारे कौरव चारी मुंड्या चीत होऊन त्याच्या पायांशी लोळण घेते आणि साऱ्या भरत खंडाची धुळधाण उडविणारे महायुद्ध ठिकच्या ठिकाणी थांबतें!
भारताचें (हिंदुस्थानाचे) महाभारत (थोर हिंदुस्थान) बनवावें, अशी श्रीकृष्णाची महत्वाकांक्षा होती, असे म्हणतात. पण आपापसांत झालेल्या सर्वसंहारी महायुद्धांत तो पक्षपाती होता. बरें, हें महायुद्ध तरी कोणत्या मोठ्या उच्च तत्त्वासाठी झालें? तर तत्त्वबित्व कांहींच नाहीं. युधिष्ठिर आणि त्याचे भाऊ या पांडवांसाठी एक साम्राज्य असावें. त्यांचा कौरवांनी केलेला अपमान भरून यावा, एवढ्यासाठींच महायुद्ध झालें. आणि त्यात अवघ्या भारताच्या क्षत्रिय कुळांचा संहार झाला. ही काय भारताचें महाभारत बनविण्याची योजना? यावरून इतकें स्पष्ट सिद्ध होते की इतर राजकारणी मानवी मुत्सद्यांप्रमाणे श्रीकृष्ण सुद्धा धोरणी डांवपेचांत भयंकर चुका करणारा एक माणूसच होता. आमच्यांतील थोर थोर विभूतींच्या चरित्राची अशी चिकित्सा केल्यानें, किंवा त्यांच्याकडे `केवळ एक मनुष्य` या दृष्टीने पाहिल्यानें, कोणाचें कांहीहि नुकसान होण्याचा संभव नाही.
दुर्योधनाच्या दरबारांत राणी द्रौपदीला खेचून आणली आणि तिची बीभत्स विटंबना करण्यांत आली, हा प्रसंग तुमच्या लक्षांत असेलच. वस्त्रहरणाची विटंबना चालली असतांना ती एकसारखी श्रीकृष्णाचें चिंतन करीत होती. त्याचा परिणाम असा झाला की दुर्योधनाचा भाऊ दुःशासन तिची लुगडी फराफर्र फेडता फेडता थकला, पण ती कांही संपतच ना.
श्रीकृष्णाच्या ज्या दैवी तेजानें हा अलौकिक चमत्कार घडून आला, त्याविषयीं जर दुर्योधनाची खात्री पटलेली असती, तर तो कितीहि उन्मत्त का असेना, त्यानें पांडवांशी सख्य जोडण्याच्या अटी नाकारून या परमेश्वरावतारी श्रीकृष्णाचा धि:कार कशाला केला असतां?
महाभारतीय हिंदुस्थानाच्या सम्राटाच्या भर दरबारांत द्रौपदीच्या-एका स्त्रीच्या-बेशरम आणि हलकट विटंबनेचा जो किळस आणणारा प्रकार घडून आला. त्याचा कडकडीत तिटकाऱ्याचा सक्रीय निषेध दर्शविण्यासाठी राजसभेतील मोठमोठे तपस्वी संतापाने उठून गेले, ही मोठी समाधानाची गोष्ट होय. एका स्त्रीदेवतेची राजदरबारांत विटंबना केल्यामुळे "या भारत खंडांतील क्षत्रिय राजांच्या हाती सम्राटपदाचा राजदंड आणि मुकुट अत:पर कधींच राहणार नाही" असा त्या तपस्व्यांनी तळतळून शाप दिलेला आहे.
ज्या ऋषि मुनीनीं हा तळतळाटाचा शाप दिला, त्यांना हिंदुस्थानांत ऱ्हासाची आणि अधःपाताची शिकस्त झाली आहे आणि भारतीय साम्राज्याची नौका ठार रसातळाला जाणार, याचें भविष्य दिसत असले पाहिजे खास. पुढे घडलेंहि तसेच. भारतीय साम्राज्य सत्तेची नौका जी पार बुडून अदृश्य झाली, ती पुढें बौद्धधर्मीय सत्तेच्या युगांत भारतसम्राट चंद्रगुप्त मौर्य या विभूतीच्या रूपाने पुन्हा अवतीर्ण झाली. ही साम्राज्यसत्ता पुढे कांही शतकें चंद्रगुप्ताचा नातू सम्राट अशोक व त्याचे वंशज यांनी टिकवली. परंतु हे मौर्य राजे कांही अस्सल क्षत्रिय नव्हते. त्यांच्या रक्तांत शूद्रत्वाची बरीच भेसळ होती.
कोट्यवधी सैनिकांचा बळी घेतलेल्या महाभारतीय युद्धानंतर युधिष्ठिर राज्य करूं लागला. राज्यकारभारासाठी त्यानें सामान्य नागरीकांतूनच कामगारांची निवड केली, आणि राजसूययज्ञानें आपलें सम्राटपद जनजाहीर केलें. पण तेवढ्यानें त्याला बिघडलेली घडी ठाकठीक बसवितां आली नाहीं. या राज्यसंघटनेचा आणि राज्यकारभाराचा खर्च भावितां भागवितां तो मेटाकुटीला आला. अशीहि एक कथा आहे की सांपत्तिक संकटांची तोंडमिळवणी करण्यासाठी, कोणी एका प्राचीन राजानें पुरून ठेवलेला व त्याला माहीत असलेला खजिना उकरून काढण्यासाठी युधिष्ठिर हिमालयातहि गेला होता. देशांत माणसांचा आणि राजकीय खजिन्यात संपत्तीचा भयंकर खडखडाट उडालेला होता.
युधिष्ठिर राजा आणि त्याचे पांडव बंधू हिमालयांत गेले, ते तिकडेच नष्ट झाले. श्रीकृष्ण, त्याची द्वारका राजधानी आणि जातभाई जाधव यांचीहि विल्हेवाट लागली. अर्जुनाचा पुत्र आणि नातू परिक्षिति आणि जनमेजय हे राज्य करीत असतांनाच अल्पायुषी होऊन वारले. अखेर राज्यावर कोणी खंबीर राजा नाहीं, लष्कराची वाताहात होऊन गेलेली, अशी दुर्दशा उडाली.
साहजीकच सर्व देशांत गोंधळ माजला. कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाही. महाभारतीय युद्धांत कौरव किंवा पांडवांच्या बाजूने लढलेल्या शेंकडों लहान मोठ्या राजांचे निर्वंश झाले. कोठे एखादा वंशज असलाच तर तो आपली राजेशाही सत्ता कशीबशी चालवीत असे. राजवंशाची नकल झालेल्या कित्येक ठिकाण लोकानीच कांहीतरी राज्यव्यवस्था चालविली. परंतु लष्करी सामर्थ्यच सर्वत्र लंगडें पडल्यामुळे, या नामधारी राजेशाही आणि लोकशाही राजसत्ता कमाल निर्बल आणि असून नसून सारख्या होत्या.
मध्यवर्ति राज्यसत्ता समूळ उलथून पडलेली, ठिकठिकाणच्या छोटेखानी राज्यांचा बेसुमार निर्बळपणा, आणि लष्करी शक्तीचा विध्वंस, यामुळे आत्मसंरक्षणाची जबाबदारी उरल्या सुरल्या सामान्य नागरीकांवर अर्थातच येऊन पडली; आणि या वेळी त्यांनी संघटनेच्या ज्या चळवळी व उचापति केल्या, त्यांतूनच आमच्या सर्व नागरीकत्वाच्या जीवन-नियंत्रणाच्या संस्था उत्पन्न झाल्या. या संस्थांचे परिणाम आमच्या शीलाची बरी वाईट कमावणी करण्याच्या कामीं किती खोलवर झाले, याचें आपण लवकरच परीक्षण करूं.
या संस्थांचे निरीक्षण करण्यापूर्वी एक गोष्ट मात्र लक्षांत ठेवण्यासारखी आहे कीं महाभारतीय युद्धांत ब्राम्हणी फलटणी, म्लेंच्छ फलटणी आणि यवन फलटणी सुद्धां एकमेकांच्या खांद्याला खांदा भिडवून लढल्या. पांडव सैन्यांत या सर्व फलटणींना सर्रास मांसाहाराची रसोयी मिळत असे. त्या काळी `आठ-ब्राम्हण नऊ चुली` या म्हणीचा जन्म झालेला नव्हता!
आतां पहाल तर खुद्द ब्राम्हणांतच दोन हजार जाती पडल्या आहेत. रायबहादुर लाला बैजनाथ यांचे `हिंदुइझम-एनशंट ॲन्ड मॉडर्न` हे लहानसे पुस्तक वाचा. म्हणजे त्यांत तुम्हाला आढळून येईल की एकट्या पंजाबांत सारस्वत ब्राम्हणांच्या ४६९ पोटजाती, क्षत्रियांच्या ५९०, वैश्य शुद्रांच्या तर हजारों आहेत. बंगाल मुंबई मद्रास अथवा संयुक्त प्रांतांतील या तपशीलाचा तपास करण्याची मला फुरसद झाली नाहीं, याबद्दल दिलगिरीचें कांही कारण नाही. आपण खात्री बाळगा की देशांतील या सर्व जाती पोटजातींची गणति केली तर आकाशांतल्या चांदण्यापेक्षां खात्रीने जास्त भरेल.
महाभारतावरून असेहि दिसून येते की त्या वेळी लग्नाच्या बाबतींत जातिभेदाची कुंपणे आड येत नसत. वाटेल तो वाटेल तिच्याशी प्रेमाच्या किंवा आवडीच्या सबबीवर लग्न लावीत असे. शूद्रांशिवाय इतर वर्गांच्या लोकांत, आतांप्रमाणे, जातिभेदाची तीव्रता मुळीं अस्तित्त्वांतच आलेली नव्हती. गोमांस आणि डुकराचें मांस कोणीहि वर्ज्य मानलेलें नव्हतें. सोमरस पिण्याच्या बाबतीत यत्किंचितहि प्रतिबंध नव्हता. भारतकाळी किंवा तत्पूर्वीच्या रामायण काळी स्त्रियांना पडद्यांत डांबून ठेवण्याचा प्रघात मुळींच नव्हता.
महाभारतीय युद्धकाळ आणि बौद्ध धर्माचा उदयकाळ यांमधील कित्येक शतकांचा जो अवधि गेला, त्याला कृष्णयुग अथवा अंधाराचा काळ हेंच नांव देणें योग्य होईल. ज्या अनेक संस्थांनी आमच्या सामाजिक जीवन-नियंत्रणाला भलभलतीं वळणें लावलीं, त्यांचा प्रादुर्भाव या कृष्णयुगांतच झाला. याच युगांत स्त्रिया आणि शूद्र यांच्या हक्कांवर व जीवनावर गदा पडली. ब्राम्हणांच्या भिक्षुकी सत्तेचा पारा बेसुमार वाढला, कडक जातीभेद निर्माण झाला. स्त्रीस्वातंत्र्याला प्रतिबंध पडला, आणि शूद्रांना शुद्ध गुलामगिरीचें दास्य मिळाले, ते याच कृष्ण युगांत.
बौद्ध धर्माचा उदय म्हणजे सर्व बाजूंनीं हिंदुस्थानच्या सुवर्णयुगाची मंगल प्रभातच म्हटली पाहिजे. या युगानें स्त्रियांना स्वातंत्र्य दिले आणि जातीभेदाच्या पिळून निघालेल्या शूद्रांचा सर्वतोपरी उद्धार केला.
बुद्धोत्तर काळी बौद्ध संस्कृतीचा ऱ्हास झाल्यानंतर, तिच्या राखेतून हिंदु संस्कृतीचें जे पुनरुज्जीवन झाले, त्या हंगामांत बायकांना पडद्यांत कोंडून ठेवण्याची रूढी सुरू झाली असावी असें माझें मत आहे. त्या वेळी हिंदु समाजाची स्थिती अत्यंत व्यसनाधीन आणि शिष्टाचारांत बरीच निर्लज्ज आणि पागल बनलेली होती. अशा अवस्थेंत स्त्रियांना पुरुषांपासून वेगळ्या ठेवण्याची इतकी आवश्यकता प्रबुद्ध व ज्ञानी लोकांना भासू लागली, की स्त्रियांच्या बाबतींत पुरुष काय वर्तन करील आणि काय नाहीं, याची कोणालाच हमी देतां येत नव्हती. एकाच घराच्या छपराखाली रहात असले, तरी सुनेनें आपल्या सासऱ्या पुढें किंवा इतर वडीलधाऱ्या पुरुषांपुढे बुरखा घेतल्याशिवाय जातांच कामा नये, असा निर्बंध पडला. फक्त एकट्या नवऱ्यापुढें बुरख्याची अट नसे. (उत्तर हिंदुस्थानांतल्या कांही जातींतील स्त्रिया इतरांना खुशाल तोंड दाखवितात; पण नवरोबा येतांच पटकन बुरख्यांचें घुंगट मारतात. मारवाडणीच्या घुंगटाची रीत तर कांही विचारूच नये. तात्पर्य, बुरख्याचा विनय आणि विनयाचा बुरखा या गोष्टी सध्यां लज्जास्पद व हास्यास्पद स्थितीत आहेत. - अनुवादक.) हें तरी सुदैवच म्हणायचे!
हिंदु समाजाला या असल्या बेफाम कामातुर आणि बेशरम स्थितींतून जावें लागल्यामुळें, त्याच्या अधःपाताचें एक कारण येथेंच सांपडतें. या नंतर मुसलमानशाही सुरू झाली. त्या वेळीं सुद्धां स्त्रियांच्या सुरक्षिततेबद्दल लोकांचा विश्वास वाढविण्याचे काम त्यांच्या हातून घडलें नाहीं. अर्थात् पडद्याची चाल चालूंच राहिली आणि अखेर ती सुखवस्तु प्रतिष्ठितांची एक रूढीच होऊन बसली. उलट, मुसलमानांनी या रूढीच्या टिकावाला जास्तच उत्तेजन दिलें. त्यामुळे चालूं घटकेला जरी पडदारूढीचीं कारणें अज्जीबात नाहींशी झाली आहेत, तरी रूढी म्हणून पडदा आहे तो आहेच.
पडदा-रूढीचा उगम कसा काय झाला, याबद्दल माझा आणि कै. पंडित राजेंद्रचंद्रशास्त्री यांच्यांत बराच मतभेद आहे. त्यांच्या मतें `अवरोध` उर्फ पडदा वैदिक आणि रामायण काळींहि होता. या विधानाच्या पुष्टीसाठीं ते एक रामायणांतलें उदाहरण देतात. रावणवध झाल्यानंतर `बंदीखान्यांतून जाहीर रीतीनें चालत येऊन मला भेट` असा रामानें सीतेला निरोप पाठविला. परंतु तिनें `मी पालखीतच बसून येईल` असा आग्रह धरला. यावरून कांहीतरी पडदा आच्छादन किंवा आवरण असल्याशिवाय स्त्रियांनीं चारचौघांत बाहेर पडूं नये, हा नियम सीता विसरली नव्हती. घरांच्या व वाड्यांच्या कोना कोपऱ्यांतून मोठमोठ्या लवाजम्याच्या स्वाऱ्या व मिरवणुकी पहाण्याच्या स्त्रियांच्या प्रघाताचीं कित्येक उदाहरणें संस्कृत वाङ्मयांतून पंडितजीनीं दिली आहेत.
पंडितजीबद्दल योग्य तो आदर कायम ठेवून मी म्हणतों की त्यांच्या पुराव्यांवरून हा सिद्धांतच मुळी सिद्ध होत नाहीं. सीता अशक्त झाली असेल, तिला बंदीखान्यांतून एकदम हजारों लोकांपुढे जाहीर रीतीनें यावयाला संकोच वाटला असेल, किंवा तिचे पायहि दुखत असतील. म्हणून रामाच्या आज्ञेला न जुमानतां तिनें पालखींतून येण्याचा हट्ट धरला असेल. आतां, संस्कृत ग्रंथांतील पुराव्यांविषयीं म्हणाल, तर ते सारे बुद्धऱ्हासोत्तर काळीं लिहिलेले आहेत, हें विसरून चालणार नाहीं. बौद्ध संस्कृतीचा ऱ्हास होऊन हिंदु भिक्षुकी संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाच्या चळवळीच्या हंगामांतच मनुस्मृति रामायण आणि महाभारत या ग्रंथांच्या पुनर्लेखनाच्या कमींत कमी निदान दोन दोन तरी `सुधारून वाढविलेल्या` आवृत्त्या बाहेर पडल्या ही गोष्ट सर्वश्रुतच आहे.
आतां आपण आपल्या सामाजिक संस्थांकडे वळूं या. भारतीय महायुद्ध आणि शिकंदराची स्वारी या मधील हजार वर्षाच्या काळाच्या अवधींत या संस्थांची स्थिती काय होती, याचा विचार केला, म्हणजे आपल्या उत्क्रांतीचा इतिहास आपणांस चांगला कळून येईल.
भारतीय महायुद्धांत देशांतील क्षत्रिय राजांचा निःपात झाला आणि लष्करी सामर्थ्य कायमचे लंजूर पडलें. याचा परिणाम असा झाला की गांवोगांवच्या आणि खेड्यापाड्यांतल्या लोकांना चोर लुटारू पासून आपापल्या जीवित वित्ताचे संरक्षण करण्यासाठीं लहान लहान गांवकीचे संघ निर्माण करणे भाग पडले.
गांवपोलीस आणि गांवशिबंदी या दोन परस्पर सहायकारी संघांचा उगम येथेंच झाला. यांचे उदाहरण पाहून व्यापार धंदे शेती वगैरे सर्व लहान मोठ्या उद्योगांचे. हितसंरक्षण करणारे अनेक संघ निर्माण झाले. त्या वेळीं दिवस फार वाईट होते. कोणत्याही बाबतींत एकच मनुष्याच्या तंत्रानें वागण्याचा विश्वास कोणांतही नव्हता. परंतु सार्वजनिक हितासाठी एकजुटीनें काम करणाऱ्या संघांवर मात्र सर्वांचा विश्वास असे. तोळा मासा सोन्याचा एखादा दागिना घडवायचा असला, तरी एकट्या दुकट्या कारागिराच्या हातीं कोणी सोनें देत नसें; तर सुवर्णकारांच्या संघाकडे मात्र बिनधोक तें काम देण्यांत येई.
संघटित सहकार्याचें महत्त्व सर्व व्यवहारांत सारखें सुरूं झाले. जमिनीची मालकी, मशागत, पेरणी, कापणी इत्यादि सर्व कामें संघटनेनें होत असत. अविभक्त कुटुंबव्यवस्थेचा उगम याच तत्त्वांतून झाला. सहकार्याच्या व संघटनेच्या या स्पिरीटचा उपयोग हिंदु जनांच्या सामाजिक जीवनावर फारच हितकार असा झाला. परिस्थितीच अशी आली होती कीं हिंदुंना संघटनाची व सहकार्याची कांस धरल्याशिवाय तरणोपायच नव्हता.
एखाद्या प्रांतावर दुर्बळ बेकर्तबगार राजा असो, किंवा मुळींच कोणी नसो, त्याची कोणी फारशी दिक्कत बाळगीत नसे. सर्व प्रकारच्या लोकव्यवहारांत जिकडे पहाल तिकडे संघटित सहकार्याच्या जोरावर कामें चालत आणि त्यांचे परिणाम लोकांच्या घरगुती, सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि आर्थिक जीवनांत स्पष्ट उमटत असत.
अखिल हिंदु जनांच्या जीवन-नियंत्रणासाठीं निरनिराळ्या संघांच्या संघटनेची ही जी पुनर्घटनेची लाट उसळली, तींत समाजाच्या धर्मविषयक व कायदेविषयक नियंत्रणाची जबाबदारी राखणाऱ्या ब्राम्हण वर्गालाहि इतर सर्वांच्या बरोबर, क्षत्रिय वैश्यांप्रमाणे, सहकार्याचे एक सामाजिक स्थळ पत्करावेंच लागलें.
या भिन्नभिन्न संघांचें नियंत्रण होण्यासाठीं प्रत्येकानें आपापल्यासाठीं निरनिराळें नियम आखून घेतले. हे नियम कांही तरी ठोकळ व ओबडधोबड असत. संघातील प्रत्येक व्यक्तीचें हित कसें साधलें जाईल, यापेक्षां विशेष विवंचना त्यांत कांहींच नसे. जसजसा काळ लोटला, तसतसे हेच ओबडधोबड नियम त्या त्या संघाच्या रूढ्या व रीतीभाती होऊन बसल्या.
संघटनेच्या या धामधुमीत हिंदु समाजांतील प्रत्येक संघांत एक प्रकारचें नवीन चैतन्य जरी उत्पन्न झालें, तरी प्रत्येकाची संघटना `वॉटरटाईट कंपार्टमेंट`प्रमाणें कडक कुंपणाची एकलकोंडी बनली. एका संघाचा बाकीच्या सर्वांशी कांहीं संबंधच उरला नाहीं. जो तो आपापल्या कुंपणी कोंडाळ्यांतच काय तो गर्क! कारण एका संघांतला माणूस दुसऱ्या संघांत मिसळणे शक्य नसे.
अर्थात् प्रत्येक संघ आपापल्या पुरतां पहाणारा आणि आपापली कामें करून पोट भरणारा सवता सुभाच बनला. हक्क अधिकार फायदे आणि संपत्ति मिळवायची, ती फक्त आपापल्या संघांतल्या व्यक्तीच्या हितासाठी त्यांत दुसऱ्या कोणाचें बोटहि शिरकूं द्यावयाचें नाहीं. सामाजिक जीवनाच्या उत्क्रांतीत ही जी कुंपणवाली संघस्थिती उत्पन्न झाली. तींतूनच जन्मप्राप्त किंवा कर्मप्राप्त हक्कांचा जन्म झाला. याच्या पुढची पायरी म्हणजे मिळकतीचा उपभोग मुलांनी बापाच्या बरोबरीनें घ्यावयाचा अथवा बाप मेल्यावर त्या मिळकतीचे आपापसांत समसमान वाटे करून घ्यावयाचे.
हिंदु समाजाची ही जी संघवार विभागणी झाली तिचा ब्राम्हण वर्गाला फार फायदा झाला. शिक्षण, ज्ञान आणि भिक्षुकी या तीन गोष्टींची मिरास यांच्याच हाती राहिल्यामुळे बुद्धिमत्ता आणि इलमबाजी यांत त्यांचा हात कोणालाच धरता येईना. त्यांनीहि आपली या बाबतीत इतकी भरभक्कम संघटना केली की प्रत्येक गोष्टीत राजापासून रंकापर्यंत सर्वांनाच त्यांच्या ओंझळीनें पाणी प्यावे लागत असे.
ब्राम्हण म्हणजे आकाशस्थ नक्षत्रांप्रमाणे चमकणारे तेजोगोल बनले. त्यांना `देवता` पद प्राप्त झाले. त्यांचे मुलगे, नातू, पणतू, खापर पणतू साऱ्यांनाच `भूदेव`पणाचा मक्ता देशांतल्या कायद्यांनी मिळाला. त्यांच्या `भूदेव`पणाला नीट काबूत ठेवणारी किंवा त्यांच्या फाजीलपणाला आळा घालणारी राजसत्ताच कुमकुवत बनल्यामुळें ब्राम्हणांचा प्रत्येक बाबतींतला शिरजोरपणा भरंसाट वाढत गेला आणि त्यांना एक प्रकारचा `पारमेश्वरी अधिकारा`चा पवित्रपणा प्राप्त झाला.
महाभारतांत भटांच्या `ब्राम्हणी पावित्र्याचे` थेर मुळींच दिसून येत नाहींत. ब्राम्हण द्रोणाचार्य कौरव पांडव राजपुत्रांचा लष्करी शिक्षक होता. त्याचा मुलगा पहावा तर तपोबळानें महर्षी व अस्त्रबळानें महान् योद्धा होता.
प्राचीन काळीं जोंपर्यंत तूं श्रेष्ठ का मी श्रेष्ठ अशा अहमहमिकेचा प्रादुर्भाव झालेला नव्हता, तोंपर्यंत भिक्षुक ब्राम्हण आणि राज्यकर्ते क्षत्रिय एकमेकांच्या खांद्याला खांदा भिडवून काम करीत असत. परंतु बौद्धधर्माच्या युगांत या श्रेष्ठकनिष्ठपणाचा अहमहमिकेला तोंड फुटतांच त्या एकीची बेकी झाली.
त्या काळच्या समाजघटनेने ब्राम्हणांना जें एक अत्युच्च महत्त्वाचें स्थान दिलें, त्याचा त्यांनी स्वजाति-वर्चस्वासाठीं भरपूर फायदा घेतला. ब्राम्हणेतरांकडून हव्या त्या निमित्तानें हवी तीं घबाडें लाटण्यांत त्यांनी दरोडेखोरांच्याहि वर ताण केली म्हटलें तरी चालेल. ब्राम्हण म्हणजे धर्मज्ञाते! पण त्यांनी खऱ्या धर्माचें ज्ञान बाजूला ठेवून, लोकांची अंधश्रद्धा ज्या गोष्टीनीं वाढेल, असल्या भोळसट व खुळचट तत्त्वांचा सर्रास प्रसार करून, आपल्या `भूदेव`पणाची उच्च मानाची टिक्की कायम राखून ठेवली. धर्माच्या बाबतीत बरें वाईट ठरविण्याचा किंवा प्रत्यक्ष आचरणाचा अधिकार क्षत्रिय वैश्यांनाहि होता. पण या भटांनीं त्यांच्या शिक्षणांत आणि ज्ञानप्राप्तीच्या मार्गांतच असा गोंधळ करून ठेवला की त्यांना मिळणारे शिक्षण म्हणजे भोळसटपण वाढविणाऱ्या अंधश्रद्धेच्या धार्मिक दंभाचें आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची वाढ खुंटवून, त्यांना नेहमी भटांच्या दराऱ्यांत आणि गुलामगिरीत डांबून ठेवणारें असेंच करून ठेवलें.
जमिनी, उद्योग धंदे आणि व्यापार या सर्व बाबी व्यक्तीच्या हातीं न राहतां जेव्हां ठरावीक संघांच्या हातीं गेल्या, तेव्हां शूद्रांना कांहीं तरणोपायच उरला नाही. अर्थात या वर्गाच्या कुटुंबांना आज हा संघ सांगेल तें काम कर, उद्यां त्याची हमाली कर, परवां तिसऱ्याचें पडेल तें काम उरक, असें कांही तरी करून पोट भरण्याचा प्रसंग आला. अर्थात् त्या बिचाऱ्यांची स्थिती गुलामांपेक्षांहि फार हलाकीची बनली.
ब्राम्हण म्हणजे पक्के डोकेबाज आणि इलमी! आस्ते आस्ते त्यांनी शक्ती संप्रदाय हातीं घेतला. माणसांना हव्या त्या गोष्टींत झटपट सिद्धि व भरभराट मिळविण्याची खास `युगत` म्हणून भटांनी तंत्रमंत्रांचे पोतडें खुलें केलें. मंत्रोच्चारानें आणि तंत्रोपायानें इकडची दुनिया तिकडे करता येईल, या कल्पनेचा पुकारा करतांच सारा हिंदु समाज बेभान झाला. विशेषतः स्त्रीवर्गावर या तंत्रमंत्रांची छाप तर बेसुमार बसली. बहकलेल्या नवऱ्याला किंवा रुसलेल्या प्रियकराला ताळ्यावर आणणारी `प्रेमोद्दीपक रसायनें` वैऱ्याला मातींत झटपट घालणारी `जहर जडीबुट्टी` त्याचप्रमाणें त्यांची उलट सुलट उताऱ्याची `दिव्य मंत्र रसायनें` सर्वत्र बोकाळली. जादूटोणा व कोहडेबाजी यांचा इतका भयंकर सुळसुळाट माजला की भटांच्या या मंत्रतंत्रापुढें सारी दुनिया थरकांप टरकूं लागलीं.
स्वतःच्या जातीचें वर्चस्व एनकेन प्रकारेण टिकविण्यासाठी भटांनीं हा मंत्रतंत्रांचा जो उपद्व्याप सुरूं केला, त्यामुळें आर्यकालीन् साध्यसुध्या शुद्ध जीवनाच्या ध्येयापासून ते च्युत झाले. `परोपकाराय इदं शरीरम्` ही जी ब्राम्हण्याची मूळ दिशा व ध्येय त्याची माती झाली आणि त्या ऐवजीं विषयलोलुपता, सत्तेची हांव आणि बेहरामीची संपत्ति मिळविण्याच्या फंदांत साऱ्या भटांचे ब्राम्हण्य गर्क झालें. अर्थात् सारा ब्राम्हणवर्ग आधाशी, स्वार्थी आणि एक नंबरचा पाजी बनला.
आपल्या स्वतःच्या स्तोमाला झगझगीत राखण्यासाठीं भटांनीं अज्ञान गोरगरीब लोकांना हवे तसे लुटून पिळून काढले. कारण, जात्याच ते अडाणी असल्यामुळे भटांच्या लुच्चेगिरीला ते तेव्हांच बळी पडत असत. विवाह होऊन स्त्रीला ऋतु प्राप्त झाला की तिची खास पहिली रात्र ब्राम्हण भिक्षुकाच्या शय्येवरच साजरी झाली पाहिजे असा शिष्ठसंप्रदायच रूढ होऊन बसला. त्यामुळें भट म्हणजे हिंदु समाजाचा सनदशीर गर्भदान्याच बनला. या घाणेरड्या व हलकट भटी महात्म्याविरुद्ध समाजांत जो त्वेष धुमसत होता, त्यांतूनच अखेर हिंदुस्थानांत नवमतवादी बुद्धधर्माचा उदय आणि उत्कर्ष झाला. परंतु भटी आणि भटाळलेल्या धर्ममार्तंड भिक्षुकं इतिहासकार कंपूच्या पाजी कारवाईमुळे, आमच्या राष्ट्रीय जीवनांत चैतन्य उत्पन्न करणारा हा बौद्धधर्मीय महत्त्वाचा इतिहास आज लोकांच्या दृष्टीला दिसणार नाही. इतक्या सफाईनें उलटापालटा फिरवून टाकलेला आहे.
काव्येतिहासाचा (Epic) काळ बराच मागें टाकून आपण आतां बौद्ध-भारताच्या ऐतिहासिक काळांत प्रवेश करीत आहों. या दोन काळांतील कांही इतिहाससिद्ध तत्त्वें नीट विचारांत घेणे अगत्याचें आहे.
कुरूक्षेत्रावरील भारतीय महायुद्ध आणि नंद महापद्माचें राज्यारोहण यांत अजमासें एक हजार वर्षांचें अंतर असावें, असा संशोधकांचा अभिप्राय आहे. `अर्थशास्त्र` नामक जगप्रसिद्ध ग्रंथाचा कर्ता अचाट राजकारणी कौटिल्य उर्फ चाणक्य नामक ब्राम्हणानें नंदाला मगधाधिपति केले. क्रिस्ती शकपूर्व ३२६ सालीं हिंदुस्थानवर शिकंदराची स्वारी होण्यापूर्वींच थोडी वर्षें नंदाचा राज्याभिषेक झाला होता.
शिकंदरानें आपलें ग्रीक सैन्य घेऊन अटक नजिक सिंधूनदीला ओलांडले, त्या वेळीं हा देश पादाक्रांत करण्याच्या कामीं त्याला एका देशद्रोही हिंदु राजानेच मदत केली, ही गोष्ट विशेष लक्षांत ठेवण्यासारखी आहे. राष्ट्राच्या पडत्या काळांत देशद्रोह फार संवंग पिकतो. हिंदु समाजाची सामाजिक मनोवृत्ती आरपार सडली म्हणूनच त्यांच्या ऱ्हासाची असल्या देशद्रोहानें तयारी केली, असा बायॉलजिष्टांचा अभिप्राय आहे. निस्पृह नीतिमत्तावादी म्हणतात कीं, वैदिक आर्यांनीं रावण आणि द्राविडी नागांचा जो भयंकर विश्वासघात व नाश केला, त्याचाच सूड काळचक्रानें शिकंदरापासूनच्या परचक्रांनी हिंदु लोकांवर पुरापूर उगवून घेतला.
दुसरी एक गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. शिकंदर आणि त्याचे ग्रीक सैन्य हिंदुस्थानला लुटून माघारे परतले असतील नसतील, तोंच इकडे चाणक्यानें नंदराजाला नालायकीच्या सबबीवर पदच्युत करून, त्याच्या जागीं चंद्रगुप्त मौर्याची मगध देशाच्या सिंहासनावर स्थापन केली. याला आपण पहिला चंद्रगुप्त असें म्हणू.
नंदाचा राज्याभिषेक जर इ.स. पूर्व ३२४त झाला, तर भारतीय महायुद्ध इ.स. पूर्व १३२४त झालें, असें गृहीत धरायला कांहीं हरकत नाही. कांहीं विद्वानांच्या मतें हा काळ इ.स. पूर्व २००० किंवा २५०० वर्षे ठरतो. कांहीहि असो, प्रस्तुत निबंधासाठी मी इ.स. पूर्व १३२४ हाच काळ गृहीत धरून चालतो. या एक हजार वर्षाच्या अवधीत, वर वर्णन केलेल्या निरनिराळ्या सामाजिक संघांची घटना बनत गेली होती.
कौरव पांडवांच्या इंद्रप्रस्थाची आणि हस्तिनापुराची धूळधाण उडाल्या नंतरच्या या हजार वर्षांच्या कृष्णयुगांत मगध राष्ट्राची राजधानी जी पुष्पपूर अथवा पाटणा ही तत्कालीन भारताच्या राजकारणाचें एक पराक्रमी केंद्र होऊन बसली होती.
या मुद्यावर सुप्रसिद्ध संशोधक ऑन. मि.के.पी. जयस्वाल, एम.ए.बार अॅट लॉ. (पाटणा) यांनी बराच प्रकाश पाडला आहे. ते म्हणतात, मगध येथील बृहद्रथ राजवंशाच्या कालगणनेचा चिकित्सापूर्वक तपास केला तर असें आढळून येतें की भारतीय महायुद्धापूर्वी या वंशांत पंधरा राजे झाले. त्यापैकी सहदेव हा महायुद्धांत लढून मेला. हें राजघराणें एकूण हजार वर्षे राज्य करीत होते. महायुद्धानंतर २७ राजे झाले. त्यांची कारकीर्द इ.स. पूर्व ७२७ पर्यंत ६९७ वर्षांची झाली. या वर्षी शैष्णुक (शिशुनाग?) घराण्यानें मगधाचे राज्या बळकावून त्यांना पदच्युत केले. (या मुद्याची विशेष माहिती `जर्नल ऑफ धी बिहार अँड ओरीसा रिसर्च सोसायटी` मार्च १९१९ पृष्ठ २ मध्यें मिळेल.)
या काळांत राजघराण्यांच्या उलटापालटी वारंवार होत असत. शैष्णुक घराणे आणि राजा अजातशत्रू यांच्या मधल्या काळांत तर अनेक क्षुद्र राजघराणीहि उदयास येऊन अस्ताला गेलेली आढळतात. अजातशत्रू राज्य करीत असतां, शिकंदरच्या स्वारीपूर्वी २३७ वर्षे, म्हणजे इ.स. पूर्व ५६३ सालीं महात्मा बुद्धाचा जन्म झाला.
विश्वासू सेनापतीने किंवा प्रधानानें आपल्या धन्याच्या विरुद्ध बंड करून त्याला पदच्युत करावें, राज्य बळकाऊन आपलें राजघराणें चालूं करावें. प्रत्यक्ष राजपुत्रांनी आपल्या राज्यकर्त्या बापाचा खून पाडून सिंहासन बळकवावें, या गोष्टी म्हणजे त्या काळी जवळ जवळ `फॅशन` प्रमाणेच सर्रास चालूं असत.
अजातशत्रू राजाचा खून त्याचा पुत्र बिंबसार यानें करून सिंहासन पटकाविलें या बिंबसाराच्या अंमदानींतच, तत्कालीन आचारविचारभ्रष्ट भिक्षुकशाही (अ) धर्माविरुद्ध महात्मा बुद्धानें आपल्या नवमतवादाचा हल्ला चढविला.
राजा बिंबसाराच्या निमंत्रणावरून युद्ध आणि महावीर (जैनधर्म प्रवर्तक) या दोघांनी अजमासें १२ वर्षे मगध राज्यांत ठाणें देऊन तेथूनच आपापल्या धर्माचीं सत्य तत्त्वें प्रसार करण्याचा उद्योग केला. त्यांची प्रवचनें पाली भाषेंत असत. कारण त्या वेळी पाली हीच लोकांची रूढ भाषा होती. संस्कृत म्हणजे भिक्षुकशाही भटांची व त्यांच्या तंत्रमंत्राची भाषा असल्यामुळे, तिला या दोघांहि नवमतवाद्यांनी वाळीत टाकून लोकमान्य पाली भाषेचा पुरस्कार केला.
वैष्णवपंथी ब्राम्हणांना महावीराच्या तत्वांपेक्षा बुद्धाची तत्त्वें विशेष पाखंडीपणाची म्हणून झोंबली. "या पाखंडामुळे वेदप्रणित स्फूर्तीचा दिव्य प्रकाश लोपला आणि हिंदुस्थानांत सब गोलंकाराचा अधर्म मातला" अशी त्यांनी हाकाटी केली. "हा अधर्म कलियुगाच्या अंतापर्यंत थांबणार नाही. या युगाच्या अंतीं भगवान विष्णू कल्की अवतार धारण करून येईल आणि मग या अधर्मी पाखंडाचा नायनाट होईल" असें ते म्हणू लागले.
येथेंहि पुन्हा वैष्णवांच्या हाडींमासीं खिळलेलें अवतार कल्पनेचें गारुड आणि भविष्यकथनाची हिकमत दृष्टीस पडते. त्यांच्याच मतांप्रमाणे चालूं कलीयुगाचा शेवट व्हायला आणखी चार लाख वर्षांचा अवधि आहे. अर्थात वैष्णवांच्या कल्की अवताराचें भविष्य खरें होतें का खोटें ठरतें, हें पाहण्याचें भाग्य आमच्या आयुष्याच्या नशिबीं लिहिलेलें दिसत नाहीं!
बौद्ध धर्मानें हिंदुस्थानाला अधर्माच्या कुमार्गावर ढकलून दिलें, या वैष्णवांच्या खोडसाळ आरोपांत काडीइतकेंहि सत्य नाही. हिंदुस्थानच्या अधःपाताच्या दोषाचें खापरच जर कोणाच्या टाळक्यांत फोडायचें असेल, तर तें वास्तविक न्यायानें भिक्षु ब्राम्हणांच्याच होय. आपलें पाप दुसऱ्याच्या पदरीं बांधण्याची भटांची फार जुनीच खोड आहे. शिवाय, बौद्धधर्मावर भटांनी केलेले आरोप एकतर्फी आणि बौद्धधर्म हिंदुस्थान सोडून परागंदा झाल्यानंतर अनेक शतकांनी केलेले असल्यामुळें, त्यांना कवढीचीहि किंमत नाही.
उदारमनस्क बौद्ध धर्माची, त्याच्या जन्मभूमींतच, जी वाताहात व हद्दपारी झाली, तिचा हिंदु जनांच्या ऱ्हासाशी आणि अधःपाताशी बराच कार्यकारण भावाचा संबंध आहे. यांत मुळींच संशय नाही. माझें तर असे स्पष्ट मत आहे की हिंदुस्थानांतून बौद्ध धर्माची हद्दपारी झाल्यामुळेच हिंदु समाजाचा सर्वतोपरी अधःपात झाला. कारण, भटांभिक्षुकांच्या धार्मिक झब्बूशाहीच्या पचनीं पडल्यामुळे हिंदु समाजाला एकराष्ट्रीयत्वाची घटना करता आली नाहीं. एकराष्ट्रीयत्वाची त्यांची भावनाच ठार मेली, आणि परचक्रांपासून देशाचें संरक्षण करण्यासाठीं ऐक्य भावनेची जी पोलादी तटबंदी लागते, ती भावनाच मुळी त्यांना पारखी होऊन बसली. कसाहि आणि कितीहि विचार करा, एक गोष्ट स्पष्ट सिद्ध होते कीं या हिंदु राष्ट्राची मान जर कोणी कापली असेल तर ती भटांब्राम्हणांच्या भिक्षुकशाहीनेंच होय. या शाहीचें जसजसें पृथ:करण करावें, तसजसें प्रत्ययानें हेंच म्हणावें लागतें कीं राष्ट्राचा घात करण्यापेक्षा अधिक कसलाहि गुण या भिक्षुकशाहीत नाहीं; आणि जोंपर्यंत तिचा धिंगाणा चालूं आहे, तोंपर्यंत हिंदुंच्या पदरी राष्ट्रघातापेक्षा निराळें कांहींच फळ पडणें शक्य नाहीं.
बुद्धोदय कालीन हिंदुस्थान भटांब्राम्हणांच्या जुलमी घाशीरामी खालीं विव्हळ होऊन पडला होता, ही गोष्ट नाकबूल करतांच यायची नाहीं. त्यांची ती वेदोक्त यज्ञयागांतली घाणेरडी पशुहत्त्या, तीं त्यांची तंत्र मंत्रादि क्रियाकर्में, आणि इतर सटर फटर घटपटादि खटपटी यांचा इतका भयंकर सुळसुळाट उडाला की लहान मोठ्या, बऱ्या वाईट समाज-जीवनाचा कोना कोपराहि डागळल्या शिवाय शिल्लक उरला नाहीं. या मुळें समाजांतील केवळ खालच्या दर्जाच्या लोकांनाच तिटकारा येऊं लागला असें नव्हे, तर वरच्या दर्जाच्या विचारी लोकांनाहि मनस्वीं चिळस येऊ लागली.
भटाभिक्षुकांच्या यज्ञयागांच्या या थोतांडांत कल्पनातील द्रव्यराशींचा चकणाचूर (यज्ञांतील तुपाप्रमाणें किंवा चरबीप्रमाणें या द्रव्यराशी यज्ञांत जळून खाक न होतां, या भटाभिक्षुकांच्या बटव्यांत सुरक्षित जाऊन पडत असत, हें स्पष्ट करून सांगायला नकोच.) तर होतच असे; परंतु, राज्यारोहण समारंभ, किंवा आवडत्या राण्यांचे जन्मदिवस, अशा निमित्तानें ही यज्ञयागाचीं बण्डें तर सबंध वर्षभर एकसारखी चालूं असत. त्यामुळे प्रजाजन, दरबारी आणि सर्व सरकारी खातीं याच गडबडींत असल्यामुळें, राज्यकारभाराकडे दुर्लक्ष होऊन सारा गोंधळ माजत असे. अशा परिस्थितीत `अहिंसा परमो धर्मः` या शुद्ध सात्विक मतांचा पुरस्कार करणाऱ्या महावीर व गौतम बुद्ध यांच्या संप्रदायाच्या नैतिक तेजानें साऱ्या हिंदु समाजाचें मन आकर्षण करून टाकलें भिक्षुकशाही भटांच्या विषयासक्त लोभीपणाच्या गिधाडधाडींतून मुक्त व्हायला हाच तेवढा मार्ग त्यांना आढळून आला.
भिक्षुकी वृत्तीने ब्राम्हण धर्ममार्तंड मोठ्या गंभीरपणाचा आव आणून सांगतात कीं हिंदुधर्मपद्धती जेहत्ते सनातन वर्णाश्रम धर्माच्या पायावर उभारलेली आहे या वर्णाश्रम धर्माचा अर्थ काय? तर तुम्ही आपली जात आणि वर्ण (कातडीचा रंग) कोणा कशाचाहि स्पर्श किंवा मिश्रण होऊं न देतां शुद्ध व अकलंकित राखावा. ज्ञानार्जनासाठी एखाद्या भटगुरूच्या घरी बरीच वर्षे काढावी. मग विवाह करून गृहस्थाश्रमी व्हावें. नंतर पुढें संन्यास घ्यावा. व्रतें उद्यापनें करावी. अखेर जगाला व लोकव्यवहाराला रामराम ठोकून अरण्यांत चिंतनमग्न तपश्चर्या करीत रहावें आणि मरावें. याला आश्रमधर्म म्हणतात. प्राचीन हिंदुस्थानांत समाजव्यवस्थेच्या जितक्या म्हणून संस्था अस्तित्वांत आल्या, त्यांचें इतिहासदृष्ट्या जर निरीक्षण केलें, तर भटांच्या या आश्रमधर्माच्या आणि वर्णाश्रमाच्या वल्गना म्हणजे शुद्ध बाजार गप्पाच ठरतात.
आतां, भिक्षुकांच्या वर्णशुद्धी रक्तशुद्धी अथवा जातिशुद्धीचा विचार केला तर या शुद्धीच्या घमेंडी वायफळ आहेत. कोणाचेंहि रक्त पूर्वी भेसळल्याशिवाय राहिलेले नाहीं व पुढें राहणार नाहीं. वेदकालीन आर्य वसाहतवाले संख्येनें फार थोडे होते. आत्मसंरक्षणासाठी त्यांनी दणधाकट द्राविडीनागांच्या मुलींबरोबर सर्रास संमिश्र विवाह ठोकलेच कीं नाहीं? हे विवाह किती दांडग्या विस्तृत प्रमाणावर झाले, हे पहावयाचें असेल, तर महाभारत ग्रंथांची पानें चाळून पहा, म्हणजे खात्री पटेल.
पुराणकालाच्याहि फार पूर्वींपासून रक्ताची सरमिसळ भरंसाट होत असल्यामुळेंच प्राचीन आणि अर्वाचीन हिंदुस्थानांत असंख्य पोटजातींचा सुळसुळाट दिसून येतो. शुद्ध रक्ताची आणि शुद्ध वर्णाची नुसती मिजासच मारायची, तर रामाचा रंग सांवळा का आणि कृष्णाचा काळा का? हे दोघे तर काव्येतिहासांतले ईश्वरी अवतार ना?
हिंदु समाजाची पुनर्घटना झाल्याचा उल्लेख मागें येऊन गेला. त्या काळीं जे निरनिराळे संघ बनले, त्यांना गण, श्रेणी, जाती अथवा संघ ही नांवें असत. परंतु, स्वार्थी भटांनी आणि धर्ममार्तंडांनी जुन्या रूढार्थ कायम ठेवून वर्ण ही संक्षेपाची संज्ञा त्यांना दिली. मात्र असें करतांना वैदिक आर्यांच्या गोऱ्या रंगाच्या शुद्धतेची कसलीहि बरी वाईट कल्पना त्यांना आली नाहीं.
अ-सवर्ण विवाह आजहि चालूं आहेत. यावरून माझ्या विधानाचा अर्थ स्पष्ट होतो. मासे मारण्याचा धंदा करणाऱ्या `अ`वर्णाच्या अंबाजीनें, रानटी पक्षी पकडण्याचा धंदा करणाऱ्या `ब`वर्णाच्या बंबाजीच्या मुलीचें पाणिग्रहण केलें. या ठिकाणी `वर्ण` शब्दाचा अर्थ `रंग` किंवा विशेष मानववंश (Race) असा खचित होत नाहीं. येथें त्याचा अर्थ विवक्षित धंदा अथवा व्यवसाय करणारा संघ, श्रेणी किंवा जाति असाच घेतला पाहिजे. माझ्या मतें, समरक्त संबंधाचे निषिद्ध मानलेले अपवाद वगळून, एकाच व्यवसायाच्या संघांतील स्त्रीपुरुषाचा होणारा विवाह उत्तम होय. सारांश, `वर्ण` या शब्दाचा अर्थ केवळ विवक्षित व्यवसाय किंवा धंदा करणाऱ्या स्त्री पुरुषांचा संघ, श्रेणी एवढाच होता. यापेक्षां विशेष अर्थ त्यांत कांहींहि निष्पन्न होत नाहीं.
`वर्ण` शब्दाच्या सांवळा गोंधळा बरोबरच, डोकेबाज भिक्षुकशाहीनें `आश्रम` शब्दावरही एका विलक्षण कोटीचें पूट चढवून ठेवले आहे. एखाद्या ऋषीची मठी आहे, तेथे तो काही विद्यार्थ्यांना पाठ देत आहे, सदासर्वदा समाधींत मग्न आहे, असा `आश्रम` शब्दाचा नेहमींच अर्थ करणे चुकीचें आहे. मनुष्य ज्याचा आश्रय घेतो तो त्याचा आश्रम. झाड पक्ष्यांना आश्रय देतें, तें त्यांचा आश्रम, सारे कुटुंब घरांत राहते; त्या कुटुंबाचा आश्रम घर. न्यायाधीशाला त्याची न्यायनिर्णयाची नोकरी, हा त्याचा आश्रम. बॅरीस्टराचा आश्रम म्हणजे त्याची बॅरीस्टरकी. तात्पर्य, आत्मसंरक्षणासाठीं, उदरनिर्वाहासाठीं किंवा स्वतःच्या सुरक्षिततेसाठी जो ज्याचा आश्रय घेऊं शकतो, तो त्याचा आश्रम. त्याचप्रमाणे मनुष्य ज्या एका व्यावसायिक संघांत असेल तो संघ त्याचा आश्रम. यापेक्षा `आश्रम` शब्दांत विशेष गूढ आणि उदात्त अवडंबर कांहींच नाहीं.
`सनातन` म्हणजे काय? ज्यांत कधींच कांही बदल झाला नाहीं, होत नाहीं व होणार नाही; जें आदीपासून जसेंच्या तसेंच अस्सल, त्याला `सनातन` असे म्हणतात. `सनातन-वर्ण-आश्रम-धर्म` याचा संधि होऊन, `सनातन वर्णाश्रम धर्म` असा शब्द बनतो. ज्याचा वास्तविक अर्थ इतकाच की `प्रत्येकाने आपापले विहित कर्तव्यकर्म (England expects every man to do his duty या ब्रिटीश राष्ट्रसूत्राप्रमाणेंच India expects every Indian to do his duty इतकाच अर्थ यांत स्पष्ट होतो. विशेष कांहीं नाहीं. -अनुवादक.) बजावणें` यावर, धर्म, धार्मिक विधि, सदाचार, न्यायबुद्धी असे आणखीहि अनेक अर्थ बसविण्यांत आले आहेत; पण त्यांच्याशी माथेफोड करण्याची कांहीं जरूर नाहीं. प्रत्येक हिंदुमात्रानें आपापल्या व्यावसायिक संघांतलीं आजपर्यंत कधींच न बदललेलीं कर्तव्यकर्में इमानें इतबारें बजावण्यांत कसूर करूं नये, अशी, हिंदुत्वाचा पाया जो `सनातन वर्णाश्रम धर्म` याची शिकवण ठरते. यापेक्षां दुसरी बात त्याच्या जवळ नाहीं. या एका `युक्ती`नें भिक्षुकभटांची श्रेष्ठता खाडकन् एकजात भेटतर हिंदु समाजाच्या थेट माथ्यावर जाऊन बसली. भिक्षुकशाहीचा भट म्हणे अवघ्या हिंदु दुनियेचा म्होरक्या झब्बू! हा झब्बू नाहींसा झाला की म्हणे साऱ्या हिंदुत्वाची माती होणार! केवढी ही घमेंड, केवढा हा तोरा आणि आत्मस्तोमाची केवढी ही मिजास! अखिल वर्णांचे धर्मगुरू, पण केवळ स्वार्थासाठीं काय वाटेल तें करायला आणि बरळायला भ्याले नाहींत! हिंदुसमाजाच्या उन्नतीसाठी या लुच्चा भटांनी केवढें हो मोठे उदात्त ध्येय आमच्या पुढे ठेवलें! प्रत्येक जातीला ठरावीक धंद्याची काटेरी कुंपणे घातल्यामुळें, कोणत्याहि धंद्यांत जातीजातींची चढाओढ कायमची बंद. प्राचीन हिंदुस्थानांत मजुरांचे संप तरी कधी झाले? व्हायचेच नाहीत. कारण, मजुरी हाच मजूर-संघाचा `सनातन` वर्णाश्रम धर्म. ब्रम्हमुखोत्पन्न ब्राम्हणांच्या जन्मप्राप्त वर्चस्वाला सुरूंग लावून उध्वस्त करणाऱ्या बोलशेविझमचा प्राचीन हिंदुस्थानांत एक शब्द तरी काढण्याची कोणाची माय व्याली होती? सगळा बंदोबस्त कडेकोट कुंपणाचा!
पण खरें म्हटलें तर बौद्धधर्म म्हणजे प्राचीन हिंदु-भारतांत भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडविणारा बोलशेविक बॉंम्बगोळाच होता. यामुळेंच भिक्षुकशाही बौद्धधर्मावर वारंवार उखडते. एवढ्यासाठींच सनातन वर्णाश्रम धर्माच्या काटेकोर सोंवळ्या कुंपणाचा बागुलबोवा भटेंभिक्षुकें वारंवार दाखवित असतात. बौद्धधर्माच्या उदार छत्राखाली जे निरनिराळे `आश्रम` व `संघ` निर्माण झाले, त्यांत लोकांनीं प्रवेश करून, भिक्षुकशाहीचा पांजरपोळ सताड रिकामा टाकू नये, म्हणून भटांनी या इतक्या बंधनांची खबरदारी घेतलेली होती, हें सांगायला नकोच.
महावीर आणि बुद्ध, या दोन प्राचीन भारतीय ऋषींचीं चरित्रें आता प्रत्येक शाळेंत जाणाऱ्या मुलांनाहि चांगली अवगत आहेत. बुद्धाच्या पंथाचीं तत्त्वे कट्ट्या लोकशाहीचीं परंतु साधी सुटसुटीत असल्यामुळें, त्यांचा सर्व लोकांनी भराभर स्वीकार केला. इतकेंच नव्हे, तर त्यांचा प्रसार, अखिल हिंदुस्थान व्यापून, साऱ्या आशिया खंडात व त्याच्याहि पलीकडे फोंफावत गेला.
त्या काळीं क्षत्रिय राजे जवळ जवळ नामशेषच उरल्यामुळें, हिंदुस्थानांत ठिकठिकाणीं अनेक शूद्र राजे उदयास आले. त्यामुळें शूद्रजनांचा उद्धार झाला. अपकृष्ट पतित समाजांच्या आत्मोन्नतीचा मार्ग खुला झाला, जुलूम जबरदस्तीखाली जेर झालेल्या लोकांचा आणि विशेषतः स्त्रीवर्गाचा कोंडमारा बंद पडला. बुद्धकाळी आणि त्यानंतरहि कित्येक शतकें मगध देशावर शूद्र नृपतीच राज्य करीत होते.
भिक्षुकशाही आणि बौद्धशाही यांच्यामध्ये सुरवातीपासूनच ध्येय आणि साधनें यांचा परस्पर विरोधाचा झगडा पडला. भिक्षुकशाहीचें वर्म कडकडीत काटेरी कुंपणवजा जातीभेदांत. हा जातीभेद म्हणजे जन्मसिद्ध, सनातन आणि कोंदाटलेल्या डबक्याच्या थाटाचा. त्यावर साऱ्या सृष्टीचे ब्रम्हदेव अशा भटब्राम्हण जातीची निरंकुश सत्ता. ही सत्ता सुद्धां जन्मप्राप्त. बापाच्या मागें मुलाला वारसा. बाप-ब्रम्हदेव मेला की मुलगा-ब्रम्हदेव त्याच्या गादीवर गेला. यामुळें भिक्षुकशाही भटांचे ब्राम्हण्य म्हणजे एका ठरावीक जातीच्या निरंकुश सत्ताबाजीची झब्बूशाहीच बनली. आतां `बौद्धशाहीकडे` पहा. पहिल्या धडाक्यालाच तिनें जातीभेदाचा मुरदा पाडला. भटाब्राम्हणांच्या ब्रम्हमुखोत्पन्न पावित्र्याचा आणि त्यांच्या देवदत्त श्रेष्ठत्वाचा चेंदामेंदा केला. आणि सर्व मनुष्यांचा दर्जा सारखा, सर्वांनीं एकमेकांशीं बंधुभावानें वागले पाहिजे, कडकडीत नीतीचें आचरण करावे आणि जागृत विवेकबुद्धीनें वागावें, अशा शुद्ध लोकशाही मतांचा पुरस्कार व प्रसार केला. बौद्ध धर्मानें मूर्तिपूजनाचा निषेध केला आणि वैदिक तंत्रमंत्र आणि वैदिक देवदेवतांचे थोतांड दूर झुगारून दिलें.
मानवी स्वरूपात देव अवतार घेतो. ही कल्पना कोणत्याहि रीतीनें सिद्ध होऊ शकत नाही. या कपिलमुनीच्या सिद्धांताचाच बौद्धधर्मांनें प्रचंड प्रतिध्वनि काढला. मानवदेहधारी देव असतो का नसतो, या वादावर माथीं फोडण्याची मानवजातीला वास्तविक कांहीं जरूरच नाहीं, असें बौद्धधर्माने ठासून जाहीर केलें. ज्यांत आपण राहतों, तें जग कधींच न बदलणाऱ्या न्यायनिष्ठुर नैतिक शिस्तीनें नियंत्रित झालेलें आहे. यालाच `कर्मन्याय` असें म्हणतात; आणि याचा सर्व अर्थ "जसें करावें, तसें भरावें; जसें पेराल तसें उगवेल" यांत येतो. विस्तारलेली ही सर्व सृष्टी सनातन अशा उक्रांति-तत्त्वाबरहुकूम चाललेली आहे. मानवी दुनियेच्या मागें कष्ट क्लेश दुःखांची जी परवड हात धुऊन लागली आहे, तिची सांखळी जन्ममरणाच्या रहाट गाडग्याला चिकटलेली आहे. या शृंखळेला तोडून मुक्त होणें, यालाच मुक्ती, मोक्ष किंवा निर्वाण असें म्हणतात. ही मुक्ती मिळविण्यासाठी मनुष्यानें सदाचार-संपन्नतेची तपश्चर्या केली पाहिजे. विचार, उच्चार आणि आचार कमालीचे शुद्ध बनविले पाहिजेत. सुरापान व रक्तपात अज्जीबात वर्ज्य केला पाहिजे. कोणाहि प्राण्याला-एखाद्या कृमिकीटकालासुद्धां-केव्हांहि कसलेंहि दुःख अथवा पीडा देतां कामां नये.
भटाभिक्षुकांच्या `सनातन वर्णाश्रम धर्मी` झब्बूशाही विरुद्ध बौद्धधर्मानें `अहिंसा परमो धर्म`चें भव्य निशाण उभारलें. कोणी कोणाचा मत्सर करूं नये, रक्तपात करूं व होऊंहि देऊं नये, हेंच प्रत्येक मनुष्याचे कर्तव्यकर्म आहे. हाच बुद्धाच्या अहिंसा धर्माचा सारांश होता.
अर्थात् भिक्षुकशाहीनें बौद्धांविरुद्ध निकराचा हल्ला चढविला. हा हल्ला केवळ तात्त्विक क्षेत्रांतला नसून, बौद्धांना चिरडण्याच्या कामीं ब्राम्हणांनी सांपडेल त्या संधीचा फायदा घेतला आणि अखेर शस्त्रांनाहि हात घालून, रक्तपाताची पुण्याई कमावली. दोनहि पक्ष वर्दळीवर आलेले. कोणीहि माघार घेई ना. अशा अवस्थेंत हें ब्राम्हण-बौद्ध युद्ध भयंकर रीतींने अनेक शतकें एकसारखे चालूं होतें. या उद्विग्न इतिहासाच्या काळांत सारा देश मानवी रक्तांत न्हाऊन निघाला. मनुष्यांची बेसुमार कत्तल झाली. छळ आणि अत्याचारांचा तर कडेलोट झाला. जिकडे पहाल तिकडे मत्सर, हेवा, निंदा, द्वेष, खुनशीपणा यांचा सुळसुळाट जगाच्या इतिहासांत धार्मिक मतमतांतरांचे पुष्कळ रक्तपाती झगडे झाले; नाहीं असे नाही. परंतु भिक्षुकशाहीनें बौद्ध धर्माविरुद्ध केलेल्या झगड्यांतले अत्याचार इतक्या राक्षसी वृत्तीचे आणि चिळस आणणारे होते, कीं त्याला जगाच्या अत्यंत घाणेरड्या इतिहासांत सुद्धां दुसरी तोड आढळणार नाही.
भटाभिक्षुकांच्या पुण्याईनें या निर्लज्ज युद्धांत भिक्षुकशाही अखेर विजयी झाली आणि तिनें बौद्धधर्माला हिंदुस्थानच्या हद्दपार करण्याचें श्रेय मिळविलें. परंतु अरेरे! या विजयाचा हिंदुस्थानवर काय घोर परिणाम झाला! हिंदु समाजाच्या सामाजिक जीवनाच्या आरपार चिंधड्या उडाल्या! या ब्राम्हणबौद्ध युद्धाचा पूर्ण मुद्देसूद इतिहास अझून लिहिला जावयाचा आहे. तसा तो कधीं तयार झाला आणि आमच्या हिंदुजनांनी त्याचा मननपूर्वक अभ्यास केला की या भिक्षुकी विजयानें सारा हिंदु समाज बदफैली व्यसनांत आकंठ कसा बुडाला; त्याच्या संघटनेचे तीन तेरा कसे वाजले; सर्व बाजूंनीं ऱ्हासाची पोखरण कशी पडली; आणि मुसलमानांचें परचक्र येण्यापूर्वींच कित्येक वर्षे हा समाज किती लुळा पांगळा आणि कमकुवत होऊन बसला होता, याचे स्पष्ट खुलासे पटतील.
आतां, बौद्धधर्मानें लोकांच्या जीवनावर, शीलावर आणि त्यांच्या संस्थांवर प्रत्यक्ष परिणाम काय घडविले, याचा विचार केला पाहिजे. बुद्धाच्या उदार व प्रभावशाली संप्रदायाच्या शिकवणीचा परिणाम स्त्रिया व शूद्र यांवर विशेष झाला. भिक्षुकशाही प्रासादीक हिंदु समाजरचनेत त्या बिचाऱ्यांच्या नशिबीं अगदी शेवटची पायरी लागलेली होती. अर्थात् त्यांना आणि तरुण विद्यार्थी वर्गाला बुद्धाच्या शिकवणीनें मोहून टाकलें तर त्यांत काय नवल?
याचा परिणाम सहाजिकच असा झाला कीं भटाभिक्षुकांनी संघटनाची धडपड सुरूं केली. आंता यांचे अनुयायी बहुतेक बिनबुडाचे अलबते गलबते, विशेषतः कांहीं श्रीमंत व प्रतिष्ठित लोकच होते. भिक्षुकशाही वर्चस्वाच्या बुरूजाखालींच बुद्धानें सुरूंग रोखल्यावर भटाब्राम्हणांची दाणादाण काय विचारावी! त्यांनी बौद्धमताला पाखंडी ठरवून त्याला शक्य त्या तीव्रतेनें विरोध करण्याचा चंग बांधला. भिक्षुकी वर्चस्वाचा बुरूज म्हणजे भटांचे नाजूक मर्मस्थान. सारा जीव त्याच्यावर. जगायचें त्यासाठीं आणि मरायचेहि त्याचसाठी. त्यांच्या ऐहिक लाभांचा सारा गड्डा या बुरूजांत. या गड्यासाठी त्यांनी अनेक शतकें हाडांची काडें केलेली. कमाल हावऱ्या वृत्तीनें त्याचें संरक्षण केलेलें. अशा स्थितीत तो बुरूजच हातचा गमावणे, म्हणजे ब्राम्हणजातीचेंच उच्चाटन करून घेण्यासारखें होतें! या बुरूजाचा पाया कसकसल्या हरामखोर पातकांनी खिळखिळा झाला होता आणि त्यासाठीं काय काय डागडुज्या केल्या पाहिजेत, याची भिक्षुकशाहीला कांहीं पर्वाच नव्हती. पाया खचला तर खचो, पण निदान हा आत्मवर्चस्वाच्या बुरूजाचा डोलारा दिसतो तसा वरच्या वर टिको, म्हणजे मिळवली, एवढीच त्यांची विवंचना होती. कारण, त्या बुरूजांतच भटांचा सारा जीव! बुरूज गेला की जीव मेला!
भटी वर्चस्वाचा हा बुरूज केवढा जुलमी आणि किती हरामखोर होता व आजहि आहे, याची कल्पनाच केलेली बरी. वाचकांना नीट कल्पना यावी, म्हणून मी आमच्या हिंदुसमाजाच्या रचनेचें एक शब्दचित्र रेखाटतों. हिंदुसमाज म्हणजे एक मोठा थोरला उंच मनोरा आहे. जिवंत माणसे एकावर एक रचून त्यांच्या ढिगारांनी हा बनविलेला आहे. प्रत्येक माणसाला पोलादी तारेंत जखडून त्याची खुरमुंडी मोट बांधलेली आहे. अशा लक्षावधि मोटा एकावर एक ठेवीत ठेवीत कळसाला त्यांचे घुमट साधले आहे.
या मनोऱ्याच्या पायथ्याला अस्पृश्य शूद्रांच्या गठड्या रचलेल्या आहेत. हवा आंत बाहेर येऊं जाऊं न देणारी एक दणदणीत, जाडजूड, लोखंडी शिळा त्यांच्या डोक्यावर ठेवलेली आहे. तिच्यावर स्पृश्य शूद्रांच्या वळकट्या दाबून बसविल्या आहेत. त्यांच्या ही डोक्यांवर लोखंडी जाड शिळा. त्यावर वैश्यांना कोंबून बसवले आहेत. त्यांच्या टाळक्यांवर आणखी एक लोखंडी शिळा, त्यावर क्षत्रिय उभे आहेत. त्यांच्याहि मस्तकांवर लोखंडी शिळा आणि त्या शिळेवर ब्राम्हण उभे आहेत.
हा मनोरा तर खासा तयार झाला आणि त्याच्या उभारणीला लागलेल्या कच्च्या पक्क्या मालाचीहि वर्गवारी व दर्जावारी तुम्हांला समजली. आतां, या मनोऱ्याच्या बाहेरच्या बाजूला, वरपासून खालपर्यंत, व-र्णा-श्र-म-ध-र्म अशीं अक्षरें एकाखाली एक नीट प्रमाणांत काढा. `वर्णाश्रम` शब्दांतला `म` वैश्य ज्या लोखंडी शिळेवर बसले आहेत तिच्या वर काढा आणि `धर्म` शब्दांतला `घ` तिच्याच किंचित खाली, म्हणजे स्पृश्यशूद्रांच्या माथ्याजवळ काढा. मनोऱ्याच्या माथ्यावर द्या एक टोलेजंग निशाण फडकावून आणि त्यावर `हिंदु समाज` अशी मोठी ढोबळ अक्षरें काढा. आतां, हिंदुंच्या जातिपद्धतीचें हें चित्र पूर्ण तयार झालें.
थरावर थर देऊन रचलेल्या या जिवंत मानवी मनोऱ्याकडे नीट विचारपूर्वक पहा. वरच्या थरांच्या भारानें खालच्या थरांतील लोकांवर केवढा भयंकर दाब पडून त्यांचा कोंडमारा होत असेल, याची कल्पना करण्याचे काम मी वाचकांवरच सोंपवितों. मनोऱ्याच्या कळसावर हातपाय पसरून बसणाऱ्या जातिसंरक्षक भटाभिक्षुकांनी कळस-कुत्र्यांनी (top dogs), शूद्रांच्या दुःखनिवारणार्थं आजपर्यंत काय केलें आहे? कांहींच नाहीं. त्या शूद्रांना या मनोऱ्यांत डांबून ठेवणाऱ्या जातिभेदाच्या पोलादी शृंखळा तडातड तोडण्याचा बौद्ध धर्मांनें उपक्रम सुरू करतांच, एकजात अवघ्या शूद्रजनांनी त्या धर्मांचा पहिल्या सपाट्याला स्वीकार केला, यांत काय आश्चर्य?
आजहि हिंदुसमाजाच्या संख्याबलाचा भयंकर नाश मनोऱ्याच्या बुडाच्या गळणीनेंच एकसारखा चालूं आहे. नामशूद्रादि इतर अवनत आणि अपकृष्ट वर्ग हळूहळू हिंदु समाजाला कायमचा रामराम ठोकून परधर्माचा स्वीकार करीत आहेत. पण ब्राम्हणांना त्यांची थोडीच पर्वा आहे? हिंदु समाजाचे पुढें काय बरें वाईट होणार, याविषयीं भटब्राम्हण सध्यां बेमुर्वत आणि बेदरकार बनले आहेत. (नवरा मरो, नवरी मरो, भटाला दक्षणा मिळाली म्हणजे झालें! या पलीकडे सुहेरसुतकाचें सव्यापसव्य ब्रम्हदेवाने भटांना शिकविलेंच नाहीं. त्यांनी तरी काय करावें? – अनुवादक.)
****
भाग ६
हिंदु समाजरूपी गगनचुंबीत मनोऱ्याच्या अत्युच्य शिखराची मिरास राखणारे भटब्राम्हण, बुद्धाच्या काळीं, आपल्या `वर्णाश्रमा`च्या भारानें मनोऱ्याच्या पायथ्याचा `धर्म` स्पृश्यास्पृश्य शूद्र समाज-किती दाबून पिळून निघत आहे, हें न पाहण्याइतके बेमुर्वत आणि बेदरकार बनलेले नव्हते. बेपर्वाई आणि मगरूरी ही त्यांची अलीकडची कमाई आहे.
परंतु हिंदु समाजाच्या बुडाशी लागलेली गळणी थांबविण्याची भिक्षुकांची छातीच नव्हती. त्यामुळे बुद्ध आणि बौद्धधर्म यांविषयी भटांचा द्वेष आणि त्वेष अधिकाधिक जोरदार आणि भयंकर होत गेला. मनोऱ्याच्या पायथ्याचे शूद्र जर भराभर निसटून गेले, तर सारा मनोराच ठार ढासळून पडणार, या वाजवी भीतीनें भिक्षुकवर्ग गांगरून गेला. शूद्रांचा थर नाहींसा झाला म्हणजे. गुरूत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणें, खाडकन वैश्यवर्गाची थप्पी खालीं घसरून शूद्रांच्या रिकाम्या जागेंत कोसळणार अर्थात् त्यांच्या वरच्या थप्प्यांचीहि तितकीच अधोगति होणार!
भिक्षुकशाहीच्या गुलामगिरीतून मुक्त केल्यामुळे शूद्रांना बौद्ध धर्मांत शांत आणि समाधान यांचा लाभ झाला. त्यांनी बौद्ध संघांत प्रवेश केल्यामुळें, याच वेळीं प्रथम त्यांना शिक्षणाचा संस्कार मिळाला. आजपर्यंत भिक्षुकशाही प्रासादिक हिंदु समाजांत पाणक्ये व लाकूडतोड्ये म्हणून पिढ्यान् पिढ्या घालविलेल्या शूद्र लोकांना जीवनसार्थक्याचें आणि उपयुक्त चळवळींचें एक नविनच जग आतां खुलें झालेले दिसलें. थोड्याच वर्षांत अनेक शूद्र तरुण ज्ञानसंपन्न होऊन श्रमण बनले आणि देशांतल्या तरुण पिढीला बौद्ध तत्त्वज्ञानाचा परिचय करून देण्यासाठी खेड्यापाड्यांतून प्रवास करीत फिरू लागले. इतकेंच नव्हे तर अविभक्त कुटुंब-पद्धतीला कंटाळलेले, पण राष्ट्राभिमानाने फुरफुरलेले, ब्राम्हण क्षत्रिय वैश्य द्विज वर्गांतील, हजारों सुशिक्षित तरुण आपापल्या घरादारांना रामराम ठोकून बौद्ध संघांत प्रविष्ट झाले. यामुळें बौद्ध श्रमणांची संख्या झपाट्याने वाढत गेली. यांच्यांत जे अधिक अनुभवी आणि विशेष विद्वान होते, त्यांनी बौद्ध धर्मोपदेशकांचा (मिशनरी) आणि प्रवचनकारांचा पेशा पत्करला.
बौद्ध तत्त्वज्ञानाचा अज्ञेयवाद (agnosticism) आणि त्या पंथानें चालूं केलेली समाजोद्वाराची सेवा यांनी अखिल तरुण बुद्धिमंतांची मनें आकर्षण करून घेतली आणि बौद्ध संघ भराभर वाढत गेला. या संघाचा जनक महात्मा गौतम बुद्धाचा निरूपमेय स्वार्थत्याग आणि त्याच्या जीवनांतील शुद्धतम पावित्र्य, यांचा त्याच्या हितशत्रूंवरहि फार उत्तम परिणाम होऊन, तेहि त्याचे अनुयायी बनले. इतकेंच नव्हे तर `मी महात्मा बुद्धाचा विश्वासू शागीर्द आहे` असें सांगण्यांत प्रत्येकजण अभिमान बाळगूं लागला.
बौद्धधर्माचा स्त्रीवर्गावर काय परिणाम झाला, हें आतां आपण पाहू या. बुद्धावतारपूर्वी हिंदु जनांत पुनर्घटनेमुळे जी संघवार समाजरचना झाली होती, तींत अविवाहित स्त्रियांच्या स्वातंत्र्याची मुस्कटदाबी झाल्याचें मी मागें सांगितलेंच आहे, पूर्वी प्रचारांत असलेला त्यांचा स्वयंवराचा आपला पति आपणच निवडून काढण्याचा-हक्क या वेळी नामशेष होऊन, त्या ऐवजी स्त्रियांच्या पतिशोधनाचे क्षेत्र, त्यांचे बाप, भाऊ, चुलते किंवा पालक ज्या विशिष्ट संघांत (जातींत) रहात असतील. त्या संघापुरतेच आकुंचित बनले. (संघांची म्हणजे जातीची कोंडाळीं निर्माण होण्याच्या पूर्वी हिंदु समाजांतील हव्या त्या मनपसंत तरुणाला पाणिदान करण्याचा स्त्रियांना अधिकार असे. परंतु संघांची कुंपणे पडल्यावर, पतिशोधन तर बुडालेंच, पण पतिपसंतीचाहि मागला बाप, भाऊ, काका, मामाच्या इच्छेवर राहून जातिपुरता आकुंचित बनला. - अनुवादक.)
विवाहेच्छू तरुण तरुणींच्या स्वयंशोधनाला माजी टाकून, केवळ बाप, भाऊ, काका मामांच्या सोई सवलतीच्या व्यवस्थेवरच जेव्हां लग्नें ठरू लागली, तेव्हां असल्या जबरीच्या विवाहाविरुद्ध थैमान करणाऱ्या तरुणीहि पुष्कळ निघूं लागल्या. अशा वेळी दोन्ही पक्षांत भयंकर भांडणें लागत. तंटे बखेडे होत आणि वैमनस्येंहि माजत. तरी पण मुलींची सुटका मात्र खास होत नसे. नावडत्या सासुरवाडी तिला बळजबरीनें पाठविण्यात येतच असे. (कारण `दावे बांधून देईन तेथे गेलें पाहिजे` हा प्रत्येक मुलीच्या बापाचा वेदोक्त अधिकार पडला ना! - अनुवादक.) पुष्कळ वेळां असल्याहि बळजबरींची पर्वा न करता, कित्येक तरुणी आदळआपट, उघड धि:कार आणि बंडाळीहि करीत. वेळीं घरांतून पळूनहि जात. अर्थात् त्यांना मग सासुरवाडी परत घेण्यांत येत नसे. सामाजिक रूढी आणि रीतीभाती या वेळीं संक्रमणाच्या अवस्थेंत असल्यामुळें. असले अरीष्टापात नेहमीं पुष्कळ घडून येत असत. याचा परिणाम मात्र असा झाला की मुली वयांत येऊन सज्ञान होण्याच्या पूर्वीच त्यांची लग्नें उरकून टाकण्याचा खाक्या आईबापांनी उचलला. प्रौढविवाहाच्या नरड्यावर बालविवाह बसला तो असा.
अविभक्त कुटुंबपद्धतीच्या बंधनांमुळे तरुणांनाहि वधूशोधनाच्या संकुचित क्षेत्राचा फार त्रास होऊ लागला. ही कुटुंबपद्धती जसजशी वृद्धिंगत होत गेली. तसतसे प्रणयजन्य वधूवरमीलनाचे विवाह कमी कमी होत गेले. परस्परांच्या प्रेमपाशांत निगडित होण्याची भारतीय तरुण तरुणींना बंदी झाली. त्यांना तशी संधी व स्वातंत्र्यच मिळानासे झाले. याचा परिणाम सबंध हिंदु समाजाच्या शीलावर किती भयंकर घडला, याचें मागें मी दिग्दर्शन केलेंच आहे.
अविभक्त कुटुंबपद्धती बाहेरून जरी साजरी गोजरी दिसे, तरी तिच्या चार भिंतीच्या आंत कटु अनुभवाच्या अनेक भानगडी वरचेवर धिंगाणा घालीत असत. विवाहापूर्वी प्रेमाचे दे वाण घेवाण न होतां, केवळ नाखुषीने व जबरीनें विवाहबद्ध झालेल्या अनेक प्रौढ व सुशिक्षित वधू असत. अविभक्त घराण्यांत सासूबाई म्हणजे मुखत्यार गृहिणी.
सर्व कारभार त्यांच्या हातीं. त्या करतील तें कारण आणि बांधतील तें तोरण! त्यांच्या या प्रौढ़ व सुशिक्षित सुना त्यांना जुमानीत नसत. सासूबाईंच्या कसल्याहि शिकवणुकीचा त्या धि:कार करीत. मग काय? सासूसुनांची एकसारखी धुसफूस आणि तंटे भांडणे सुरू. त्यांतल्या त्यांत मुलानींच जर आपापल्या बायकांचा पुरस्कार केला तर मग सासुबाईचा थैमान कळसाला जायचा! अखेर या कलहाचें अपरिहार्य पर्यवसान घरांतल्या घरांत भांडणे, फाटाफूट, निरनिराळ्या चुली, इस्टेटीच्या वाटण्या इत्यादिकांस व्हायचें.
हा प्रकार टाळण्यासाठी सासू कंपूनें एक निराळीच `युगत` काढली. घराणें अविभक्त असले म्हणजे त्यांत सर्वांची सोय उत्तम लागून, गुण्यागोविंद राहणीची शांतताहि लाभते. पण सुना प्रौढ आणि शिकलेल्या आल्या की त्या सासूबाईंची मुखत्यारी धुडकावून लावतात. याला उपाय काय? तर आपल्या मुलांची लग्नें करायचीच तर ती अप्रौढ व अशिक्षित (अक्षरशत्रू असल्या तरी परवडल्या) अशाच मुलींशी करायची. चुकून सुद्धां प्रौढ वयाची सून पत्करायची नाहीं. फार काय, पण ऋतु प्राप्त न झालेली वधूच मुद्दाम निवडायची. असा दण्डक सुरू झाला. हिंदु जनांच्या ऱ्हासाची आणि अधःपाताची ही सुरवात होती. `कोवळा कळक चटकन वांकें,` `कोवळें शिंगरू लवकर शिके` असल्या म्हणी प्रचारांत आल्या आणि अज्ञान दशेंतच मुलींचे बालविवाह भराभर उरकून घेण्याची रूढी सर्रास सर्वत्र चालू झाली. (`अष्टवर्षा भवेत् कन्या` असलीं पागलपणाची सुत्रें भटी टाळक्यांतून याच वेळीं निपजलीं. असल्या सूत्रांच्या प्रसववेदना ब्रम्हदेवाला खास भोगाव्या लागल्या नसाव्या. - अनुवाद)
व्यक्ती म्हटली की त्या स्त्री किंवा पुरुषाला आचार विचाराचें आवडी निवडीचें, पूर्ण स्वातंत्र्य लागते. सडेसोट असतो तो तें स्वातंत्र्य अनुभवतो. पण हिंदुंच्या अविभक्त कुटुंब व्यवस्थेची घटनाच अशी होती की तींत व्यक्तीला कांहीं महत्त्व अगर स्वातंत्र्यच नसे. कोणाहि स्त्री पुरुष व्यक्तीची प्रकृति, आवड निवड, रूची अरूची काय वाटेल ती असो, कुटुंबाच्या सामाजिक हितासाठीं त्या त्यांना पार दाबून टाकाव्या लागत असत. व्यक्तीचे अस्तित्त्व सर्वांसाठी एरवीं व्यक्तीची किंमत पूज्य. हिंदुंच्या संघव्यवस्थेच्या योजनेचाच हा परिणाम, हे सांगणें नकोच.
शहरांत किंवा खेड्यांत राहणारी एकाच संघाची (जातीचीं) अनेक अविभक्त कुटुंबे प्रत्येक सामाजिक बाबतींत एकमताने व एकजुटीनें पुढाकार घेत असत.
दोघा भावांचे एक अविभक्त कुटुंब आहे, असें उदाहरण घ्या. दोघां मिळून चार मुली आहेत. सर्वांत थोरलीचें लग्न झालें. बाकीच्या तीनहि बहिणीनीं निश्चय केला की बस् आपल्याला लग्न बिग्न कांहीं करावयाचें नाहीं. सर्व विद्या संपादन करून कुमारी विदुषी म्हणून राहावयाचें. तर या त्यांच्या निश्चयाविरुद्ध एकदम जातीच्या जमातीत कावकाव सुरू व्हायची आणि या मुलींच्या घराण्याची हवी ती नालस्ती केली जायची. बहुशः मुलींच्या या निश्चयाला अखेर माघारच घेणे भाग पडे.
एकाच जातिसंघांतल्या लोकांना एकमेकांशी परस्पर सहकार्याने राहणेंचा भाग असे. प्रत्येकाला परस्परांचा शब्द मानावा लागत असें. वरील उदाहरणांतील लग्न झालेली मुलगी ज्या अविभक्त कुटुंबांत दिली, त्यांतल्या पुरुषांना सुद्धां तिच्या तिघी बहिणींना तशाच तऱ्हेचीं स्थळे मिळवून देण्याची विवंचना व अधिकार असे.
भिक्षुकशाही ब्राम्हणांच्या कदरीखाली वागणाऱ्या या निरनिराळ्या जातीसंघांत लवकरच एक अलिखित कायदा सुरू झाला की अविभक्त कुटुंबांतल्या प्रत्येक मुलीचें लग्न ती अगदी बाल असतांनाच झालें पाहिजे. कोणी हा रूढ कायदा किंचित् मोडला की त्या अविभक्त घराण्यावर सारा जातिसंघ बहिष्कार टाकीत असे. अर्थात् सर्व घराणीं या रूढीला अगदी टरकून असत.
बालविवाहाची रूढी अविवेकी, अशास्त्रीय आणि खोडसाळपणाची आहे, हें भटांब्राम्हणांना कळत नव्हतें, अगर ऋतू प्राप्तीपूर्वी विवाह मूर्खपणाचा आहे, हें उमजत नव्हतें, अशांतला भाग नाहीं. परंतु बौद्ध धर्मानें अखिल मानव जातीला दिलेलें सर्व क्षेत्रांतलें पूर्ण स्वातंत्र्य पाहून भटांची धाबी दणाणली आणि आपल्या वर्चस्वाला धक्का बसूं नये म्हणून त्यांनी मुलींच्या लग्नाच्या वयोमर्यादा ठरविण्याचा हा उपद्व्याप फार धोरणी डोक्यानें केला.
महाभारत काळापासून आमच्यांत ज्या ज्या समाजधारणेच्या संस्था उत्पन्न झाल्या, त्या सर्वांचा जन्म `स्वातंत्र्याच्या` कल्पनेच्या पोटीं न होतां, `भीती`च्या पोटींच झालेला दिसून येतो. अर्थात् अनेक रूढी आणि रीतीभातींच्या द्वारे आमच्या शीलाच्या घडणीवर त्यांची प्रतिक्रिया स्पष्ट उमटून, आमच्यांतले व्यक्तीत्व आणि स्वतंत्र विचार करण्याची बुद्धी यांचें पार तळपट उडालें, तर त्यांत नवल तें काय?
एकजात सर्व हिंदु-मग ते कोणीहि असोत, उजवा काष्टा घालणारे असोत, डावऱ्या काष्ट्याचा अभिमान बाळगिणारे असोत, पोषाखंत हवे तेवढ्या भेदाचे असोत, धोतरे असोत वा पाटलोणे असोत, कपाळावर चंदनाचा टिळा त्रिपुंड्र लावणारे असोत, नाहींतर फटफटींत कपाळाचे असोत-ते सारे या अविभक्त कुटुंब-पद्धतीच्या प्रचंड घरटांत दळून मळून निघालेले पिठाचे पुंजके आहेत. हा घरटच मुळीं असा जखडबंध आणि ज्याम खटक्याचा आहे कीं यांत सांपडेल त्याचें वस्त्रगाळ पीठ पडलेंच पाहिजे. अशा वस्त्रगाळी घरटांत सामाजिक सुधारणेचे नवीन विचार आणि नवीन चळवळी यांचा शिरकाव व्हायला सुईच्या अग्राएवढी तरी जागा कशानें मिळणार?
या अविभक्त-कुटुंब-घरटाचा आणखी एक विशेष महिमा आहे. यांतल्या प्रत्येक प्राण्यानें-पुरुष स्त्रिया मुलें यांनी-जन्मापासून मरणापर्यंत नव्हें मेल्यावर सुद्धां, कसें वागावें, कसें रहावें, काय खावें, काय प्यावें, इत्यादि सर्व आचार विचारांच्या नियमांचे ठरावीक तक्ते अगदी आंखून ठेवलेले. या माणसांनी दुसरे तिसरें कांहींहि करायचे नाहीं. चाकाबरोबर त्याच्या आऱ्या जशा गरगर गरगर निमूटपणे फिरतात, तसे फक्त `वडलांचे बाळबंदी वळण` घटवायचें. विचार करण्याची कोणाला कांही जरूर नाहीं. इच्छेला तर तिळमात्र जागा नाहीं आणि तिची गरजहि नाहीं. `हें असें कां? तसें कां नाहीं?` एवढा प्रश्न कोणी काढलाच की सारे गाडें बिथरून पार निकाल!
शंका कुशंका किंवा खऱ्या खोट्याची पृच्छा करण्याची मुळीं सोयच नाहीं. या हिंदु समाजव्यवस्थेत कोणी व्यक्ती आपल्या स्वतंत्र मताचा झेंडा उभारूं म्हणेल, तर तें शक्यच नाहीं. कारण आमची समाजव्यवस्थाच मुळी इतकी कडवी सोंवळी की तिच्या पुढें सर्वांनी हात टेकलेच पाहिजेत. यामुळें, आमच्या सर्व रूढींत आणि चालीरीतींत भयंकर कृत्रिमपणा आणि जुलमीपणा माजलेला आढळतो. बुद्धिवान, सुसंस्कृत आणि विवेकी विचाराचे पुष्कळ हिंदुजन आढळतात. या कृत्रिम आणि जुलमी समाजबंधनांविरुद्ध ते मनांतून खूप चरफडतहि असतात. पुष्कळ वेळा ते अंतर्यामीचा आपला निषेध बोलूनहि दाखवितात. पण अखेर वेळ आली कीं त्याच बंधनांपुढे सपशेल मान वांकवून त्यांच्या दण्डकांना बळी पडतात. कारण, हिंदुसमाज-व्यवस्थेचा कचकाच असा आहे कीं ज्या कोणाला स्वतःच्या सदसद्विवेक बुद्धीची विशेष मातबरी वाटत असेल, त्याने खुशाल या समाजांतून उठून जावें. उठून जावें! पण ही गोष्ट दिसते तितकी सोपी नाहीं. त्यांत अनेक अडचणी, भानगडी, त्रास, हाल अपेष्टा असतात. मग करायचे तरी काय? मार्गं एकच उरला. आणि तो हाच कीं सदसद्विवेक बुद्धी खुंटीला अडकवून, नैतिक षंढत्व पत्करायचे आणि आपल्या आवडत्या ध्येयाला कायमचा रामराम ठोकायचा! हा मार्ग `कमी प्रतिकाराचा` असल्यामुळे बहुतेक हिंदुंना निमूटपणे पत्करावा लागतोच.
ज्या समाजव्यवस्थेंत तुमचें जीवित, सारा आयुष्क्रम, तुमचे आचार विचार आणि तुमच्या शीलाची घडणी अशा ठरावीक दाबांतच दाबून निघत असते; ज्या व्यवस्थेंत तुम्हांला तुमच्या आवडीच्या ध्येयाप्रमाणे वागण्याचीच मुळीं सवलत मिळत नाही; तेथें तुम्हांला सारा जन्म शुद्ध दांभिक वृत्तीनें कंठण्यापलीकडे दुसरा काय मार्ग आहे?
ज्याच्या ध्येयाचीच वाताहात लागलेली, अशा माणसाकडून स्वतःच्या अगर त्याच्या समाजाच्या कल्याणाची काय कामगिरी होणार? अशा माणसाच्या नशिबीं निराशावाद लागून तो जर आरपार माणूसघाण्या बनला, तर हिंदु त्रिमूर्तींपैकी कोणता देव त्याला वाचवील? सुविद्य सुसंस्कृत सुधारणेच्छू हिंदु पुष्कळ आहेत. पण ते सारे हिंदुंच्या सामाजिक पद्धतीच्या जुलमी अन्यायांनी मनांतल्या मनांत खचून गेलेले, कट्टे निराशावादी आणि पक्के माणूसघाणेच नाहींत का बनलेले दिसत? हा सामाजिक बंधनांचा जुलमी अन्याय आमच्या त्रिमूर्ती देवांनी थोडाच निर्माण केलेला आहे! त्याचे आईबाप आमचे आम्हींच. अर्थात्, त्यामुळें प्रत्येक हिंदुमात्र देहाच्या व मनाच्या वाढींत खुंटलेला आणि आत्मविश्वासांत पोकळ खंक बनलेला आढळतो.
जेथें पुरुषच आपल्या दैवाला दोष देत रडत बसलेले, तेथें स्त्रियांचे हसतमुख कशानें दृष्टीस पडणार? पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या निसर्गदत्त सर्व गुणांची पूर्ण वाढ होण्याच्या मार्गांतच ज्या समाजव्यवस्थेचा आणि कुटुंबपद्धतीचा दांडगा प्रतिबंध, तेथें त्यांच्या पोटी खुरटलेल्या मनाची खुजीं बुटबैंगण प्रजाच जन्माला यायची. लाथ मारूं तेथें पाणी काढूं, अशा दिग्गज मर्दाची ती खाणच नव्हे. असें कधीं व्हायचेंच नाहीं.
अशाहि अवस्थेंत, नाना प्रकारचे सामाजिक छळ सहन करून, या संकुचित व ताठर समाजरचनेविरुद्ध जोराचा निषेध जाहीर करण्याचे कार्य, उदात्त ध्येयाच्या आणि खऱ्या सरदारी दिलाच्या अनेक प्रबुद्ध हिंदु सुधारकांनी, निधड्या छातीने केलेले आहे, ही गोष्ट हिंदुंच्या इतिहासांत सुवर्णक्षरांनी लिहिण्यासारखी आहे. या सुधारकांनी समाजसुधारणेच्या कामीं आपले बळी देऊन या भारतीय हिंदु-प्रबोधनाच्या जन्माची आपण आतुरतेनें वाट पहात आहों, त्याचें बीजारोपण केले.
आणखी थोडें अविभक्त कुटुंब-पद्धतीकडें वळू या. मुलींवर होणाऱ्या शिक्षणाच्या परिणामाला भिऊनच या कुटुंबपद्धतीच्या धोरणांत बदल होत गेले. अज्ञान हेच जेथें सुखाचें कारण, तेथें ज्ञानी मूर्खच ठरायचा. नाक्षरतेनें कुटुंबात जर शांती नांदते, तर साक्षरतेची नसती ब्याद कशाला? हा नियम सर्रास कडक चालूं झाला. याचा परिणाम असा झाला की लग्नापूर्वी मुलींच्या शिक्षणाला फार प्राचीन काळापासून कडकडीत आळा बसत गेला.
महाभारतकाळीं आणि त्यानंतर कित्येक शतकेपर्यंत प्रत्येक मुलीला सुप्रसिद्ध ६४ कलांचें शिक्षण देऊन प्रवीण करण्याचा परिपाठ होता. लिहिणें, वाचणें, संगीत गायन वादन, चित्रकला, कशिदा काढणें, रंगारी काम, पाकसिद्धी, शीळ घालणें, पक्षी माणसाळवून त्यांना शिकविणें, फुलांच्या बागा तयार करणें, पुष्पहार करणें, प्रणयीजनांशी प्रेमचेष्टा करणें, इत्यादि ६४ कलांचे शिक्षण मुलींना बिनदिक्कत मिळत असे. वात्सायनाच्या कामशास्त्रांत याविषयीं सर्व माहिती दिलेली आहे. विद्वान संशोधकांच्या मतें बुद्धापूर्वी सुमारे १२५ वर्षें वात्सायन होऊन गेला.
अविभक्त कुटुंब-पद्धतीच्या कडकडीत सोवळ्या सक्तीमुळें तरुण स्त्रियांची बंडाळी एकसारखी चालूच असे. बुद्धांचा उदय होण्यापूर्वी बरीच वर्षें, या सामाजिक सक्तीविरुद्ध उघड उघड बंड करणाऱ्या स्वतंत्र वृत्तीच्या स्त्रियांचा एक वर्ग अस्तित्त्वांत आला. त्यांनी आपल्या जीवनचर्येचा एक निराळाच स्वावलंबी मार्ग शोधून काढला. त्यांनी नृत्य गायन वादनादि कलांत प्राविण्य मिळवून, आपापले सवते स्वतंत्र सुभे स्थापन केले. यांना कलावंतिणी (या शब्दाचा खरा अर्थ व खऱ्या भावना नीट पटण्यासाठी वाचकांनी चारूदत्ताच्या वसंतसेनेचें चारित्र्य दृष्टीपुढें ठेवावे. कलावंतीण म्हणजे वेश्या (Prostitute) नव्हे. प्राचीनकाळी हिंदुस्थानांत कलावंतिणीचा दर्जा क्षुद्र मानण्यांत येत नसे. त्या चांगल्या सुविद्य, उदार, रसिक आणि प्रामाणिक असत. -अनुवादक.) असें नांव पडले. यांना मोठमोठ्या विद्वान व पुढारी लोकहि चांगला मान देत असत. या चतुर स्त्रियांचा विवाहावर मुळींच विश्वास नसें; परंतु त्या आपल्या ठरावीक यजमानाशीं प्रेमरज्जूनीं बद्ध होऊन इमानानें वागत. विवाहविधींतील भटांच्या चर्पटपंजरी मंत्रापेक्षां शुद्ध प्रेमाचें महत्त्व त्या विशेष मानीत असत. अर्थात् त्या अविवाहित पत्न्या आणि अविवाहित माता बनल्या. त्यामुळे संभावीत कुटुंबव्यवस्थेतल्या प्रतिष्ठित `सौभाग्यवती` ठमाबाई चिमाबाई प्रथम प्रथम त्यांच्याकडे मत्सरानें आणि नंतर कुटाळकीनें पाहू लागल्या. बोलून चालून `उठून गेलेल्या` पोरी ना त्या!
या स्वतंत्र वृत्तीच्या तरुण कलावंतिणीनीं भिक्षुकशाहीलाच बहिष्कार-खराटा दाखविल्यामुळें, भटाब्राम्हणांना ठमा चिमा बाईंच्याच धोरणानें वागण्याचा प्रसंग आला. या दिवसापासून हिंदुंच्या सुप्रसिद्ध ६४ कला दोषी ठरल्या, (कारण त्या सर्व या कलावंतिणीनी उचलल्या!) आणि ठमा चिमाबाईनी आपला कुळशीळवान घरंदाज प्रतिष्ठितपणा निर्लेप राखण्यासाठी त्या कलांना `अप्रतिष्ठित` म्हणून घरोघर बहिष्कार घातला.
भटाब्राम्हणांनी या सुंदर बंडखोर युवतींना जरी वाळीत टाकले होते, तरी सौभाग्यवती ठमा चिमाबाईंचे पतिराज, भाऊ, मेहुणे आणि जांवई सुद्धां, त्यांची नजर चुकवून या तरुण कलावंतिणींच्या प्रेमाची याचना करायला गुप्तपणानें त्यांचे उबरठे झिजविण्यास चुकत नसत. काय करणारा बिचारे! खऱ्या प्रेमशोधनाची लज्जत त्यांना त्यांच्या समाजव्यवस्थेत चुकून सुद्धां चाखायला मिळायची नाहीं. या स्वतंत्र मनमोकळ्या वातावरणांत त्यांच्या जिवाला खराखुरा आराम मिळू लागला. अविभक्त कुटुंब-व्यवस्थेच्या चार भिंतीच्या आंतलें कृत्रिम जीवन म्हणजे त्यांना रखरखित रूक्ष तुरुंगाप्रमाणेच होते. मग त्यांनी या प्रेमळ, चतुर, इमानी व खुल्या दिलाच्या नवयौवन सुंदर कलावंतिणींच्या स्नेहासाठी कां धडपडूं नये?
या कलावंतिणी चांगल्या सुशिक्षित व चतुर असल्यामुळें, बुद्धाच्या संप्रदायांतः त्यांना जीवितसाफल्याचा एक नवीन राजमार्ग सांपडता, त्यांना एक नवीन जग आणि नवा स्वर्ग दिसूं लागला. शूद्रांप्रमाणेच, मोठ्या उत्साहाने, या कलावंतिणींनीं बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांतल्या ज्या विशेष देवधर्मी वृत्तीच्या होत्या, त्यांनी बौद्ध भिक्षुणीचा पेशा पत्करून, स्त्रीशिक्षणाच्या कार्यास वाहून घेतले. बौद्धकाळच्या भारतांत दवाखान्यांच्या फारच मोठ्या प्रमाणांवर सर्वत्र स्थापना झालेल्या होत्या. स्त्रीशिक्षणाचे कार्य करीत असतांनाच या भिक्षुणी ठिकठिकाणच्या दवाखान्यांत रोग्यांच्या सुश्रुषेचेंहि काम करीत असत.
भिक्षुकशाही ब्राम्हणधर्माच्या पोटांतून आणि त्याच्याच तत्त्वज्ञानाची सुधारणा करण्यासाठी बौद्धधर्माचा जन्मं झाला, ही गोष्ट विसरता कामा नये. बौद्ध धर्म म्हणजे हिंदु समाजाच्या बाह्यांगांची वरवर डागडुजी व धू पूस करण्या ऐवजी, थेट अंतरंगाची सुधारणा घडवून आणणारी `प्रोटेस्टंट` (निषेधक) चळवळ होती. भटांब्राम्हणांच्या गैरशिस्त वर्चस्वाच्या दडपणामुळे सारा हिंदु समाज हाडकांसारखा ताठर, पाषाणासारखा बिनकाळजाचा आणि सर्वतोपरी मुर्दाड असा बनलेला होता. बौद्धधर्माच्या चळवळीनें त्यांत प्रेम, उदारपणा, माणुसकी आणि सदाचार या उत्तम गुणांच्या ताज्या गरम रक्ताचा पुरवठा सोडण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. तिखट बुद्धिमत्तेच्या तरुण विद्यार्थी वर्गांची मनें बौद्धधर्माने आपल्याकडे कशी वेधून घेतली आणि ते या नव्या विवेकशाली चळवळीच्या झेंड्याखालीं भराभर कसे जमा झाले, हें मी मागें आपणांस दाखविलेंच आहे.
बौद्धधर्माने आसेतुहिमाचल भरतखंडांत अननुभूत अशा अस्सल विवेकवादाचा प्रचंड दीप प्रज्वलीत केला. त्याच्या प्रकाशाने भिक्षुकशाहीच्या एकजात भटाब्राम्हणांची घाबरगुंडी उडाली आणि ते या नवीन चळवळीची मान मोडण्याची कारस्थान रचूं लागले. (भिक्षुकशाहीला ब्रम्हदेवानें एवढाच एक गुण शिकविलेला दिसतो. ज्या ज्या चळवळीविरुद्ध भटांब्राम्हणांची आदळ आपट व कारस्थानी डांवपेंच सुरू होतात, तीच चळवळ खरी लोकहितवादी, असें डोळे मिटून सांगावें. - अनुवादक.)
बुद्धानें आपल्या नवमतवादाचा संदेश बहुजन-समाजाच्या थेट खालच्या थरापर्यंत पोहचविण्यासाठी, सोंवळ्या संस्कृत भाषेच्या ऐवजी, त्या वेळीं प्रचारांत असलेल्या प्राकृत पाली भाषेचाच उपयोग सर्रास केला. त्याचप्रमाणें, त्याचे जितके म्हणून स्त्री पुरुष उत्साहानें अनुयायी व धर्मप्रचारक बनले, त्या सर्वांनीं कडकडीत ब्रम्हचर्य पाळलेंच पाहिजे, असा कडक कडक दण्डक त्यानें घालून दिला. धर्मप्रसारासाठी व्रतस्थ अशा ब्रम्हचारी भिक्षु भिक्षुणींची (monks and nuns) मिशनरी संस्था गौतम बुद्धानेंच प्रथम उपयोगांत आणिली. त्यामुळें प्रापंचिक ज्ञानाबरोबरच धार्मिक ज्ञानाच्या शिक्षणाचा संदेश अखिल मानवतेच्या कोनाकोपऱ्यांत नेऊन भिडविणाऱ्या निःसीम स्वार्थत्यागी तरुण श्रमणांचा एक जंगी संघ सहजच निर्माण झाला.
`अहिंसा परमो धर्मः`च्या निशाणाखालीं बुद्धानें लोकशाहीच्या प्राणप्रतिष्ठेचा सत्याग्रह चालूं केला. या सत्याग्रहानें भिक्षुकशाहीला चोहोंबाजूंनी मोर्चे लागले, आणि अधम पाजी खादाड आणि इष्कबाज भटाब्राम्हणांना खडाखड लाथाडून जमीनदोस्त केले. अशा रीतीने हिंदुस्थान आणि आशियाखंडाच्या वैभवाची कीर्ती सनातन चिरंजीव करणाऱ्या या नवीन सुधारक चळवळीचा ओघ गंगानदाप्रमाणें फोंफावत वाढत गेला.
पण आज आमची काय अवस्था आहे? सुकाणू तुटलेल्या जहाजाच्या आच्छादन नसलेल्या फलाटावर आम्ही हिंदुजन कसे बसे उभे आहोंत. परिस्थितीचा दर्या चहूंकडून बेफाम खवळलेला आहे. भौतिक (materialistic) गिधाडी मांसाहारी दारुबाज अशा पाश्चिमात्य संस्कृतीच्या भयंकर तुफानी वाऱ्याचा सोसाटा आम्हाला गदगदा हालवीत आहे. आमचे हातपाय जखडून टाकलेले आहेत. आमच्यां तोंडांना अशा प्रकारचे घाणेरडे रंग फासडण्यांत आलेले आहेत कीं त्यांमुळें आम्ही हिंदुजन बेछूट `भ्रष्ट नादान` स्वरूपांत साऱ्या जगाला दिसत आहोंत. काय ही लज्जास्पद स्थिति! शरमेनें आम्ही आपली काळी तोंडें आतां लपवावी तरी कोठें? मनाला होणाऱ्या लज्जादंशाच्या वेदना शमविण्यासाठी आम्ही आतां कोणाचा आश्रय घ्यावा? कोणाच्या चरणाला `त्राहि माम्` म्हणून विळखा घालावा? `भिऊं नका, ना भी, ना भी` अशा आश्वासनाने आम्हाला धीर देऊन, आमचा उद्धार करणारा महात्मा या जगांत कोणीच नाहीं का?
आहे आहे आहे. हिंदु बांधवांनो, आहे. ज्याच्या महात्म्याचें तेज चीन, जपान, कोरिया, सायाम, काम्बोदिया, ब्रम्हदेश, सीलोन, तिबेट इत्यादि राष्ट्रांत आजहि मानवजातीच्या उद्धारार्थ खळवळत आहे; त्या तेजाची मायभूमी जी भरतखंड तेथेंहि अझून ज्याचा अल्पस्वल्प अवशेष धमधमत आहे; त्या दयासागर, प्रेममूर्ती, अध्यात्मनिधान अशा महात्मा गौतम बुद्धाचा हिंदु-भारत जर असूनहि धांवा करील, तर अखिल मानवतेला हृदयाशी कवटाळणारा तो `आशियाचा भास्कर` तुमच्यावर आपल्या दिव्य तेजाचा प्रकाश खास पाडील.
अनात्मवादी पाश्चिमात्य संस्कृतीचा उग्र अंधार आज आमच्या भोंवतीं पसरलेला आहे. या संस्कृतीच्या पचनीं आम्ही जर पडलों तर आम्ही आमच्या राष्ट्रीयत्वाला सफाई मुकून नामशेष सुद्धां उरणार नाहीं. अशा स्थितीत अखिल हिंदुभारत ज्या धार्मिक-सामाजिक आत्मप्रबोधनाची मोठ्या आतुरतेनें धीरानें आणि विश्वासानें वाट पहात आहे, त्याच्या प्राप्तीसाठीं, देशबांधव हो, तुम्हाला त्या `आशियाच्या तेजोनिधि भास्करा`कडेच मार्गदर्शक म्हणून पाहिल्याशिवाय आता गत्यंतर नाही.
इसवी सनापूर्वी ५ व्या आणि ६ व्या शतकांतला बुद्धचरित्राचा काळ म्हणजे जगाच्या इतिहासांतला एक मोठा चित्ताकर्षक भाग होय. बुद्धजन्मापूर्वी पुष्कळ वर्षे मेसोपोटेमियाच्या मार्गानें ग्रीस आणि हिंदुस्थान यांत व्यापाराचें बरेच दळणवळण चालू झालेलें होतें. त्या काळी परदेशगमनांचा प्रतिबंध मुळींच नव्हता. `काळ्यापाण्याची अटक` हे मागाहूनचे भिक्षुकी थेर आहेत.
बुद्धाचा निर्वाणकाल झाल्यावर लवकरच एफीसस येथील हिरॉक्लीटस आणि सामोस येथील पायथागोरस हे दोघे ग्रीक तत्त्ववेत्ते बौद्ध धर्माचा प्रसार व संघस्थापना करण्यासाठी श्रमण होऊन सर्वत्र फिरत होते.
`हेलेनिक कल्चर` (ग्रीक संस्कृती) म्हणजे पाश्चिमात्य जगाचें (युरपचें) कलदार शिक्क्याचें नाणें म्हणून गणले जाते. पण ही संस्कृति मूळ कोठची? आशिया मायरनची. आणि आशिया मायनरमधील ग्रीक शहरांनी ती हिंदुस्थानांतून नेलेली. त्या वेळीं कातडीच्या काळ्या गोऱ्या रंगाचा अथवा संस्कृतीचा कोणताहि भेद पूर्व आणि पश्चिमेत विषम भाव उत्पन्न करीत नव्हता.
पारशी जनांचा झोरास्टर उर्फ झरतुष्ट्र याच काळांत उदयास आला. परंतु याच्या उपदेशाला पारशांतील जातिभेद मोडण्याच्या कामीं मात्र मुळींच यश आले नाही.
अलेकझांडरनें (शिकंदरनें) इ. स. पूर्व ३२६ सालीं पंजाबवर जी स्वारी केली, तिचा हिंदुस्थानावर कांहीच परिणाम घडला नाही. याचें कारण, हिंदु संस्कृती त्या वेळी चांगली सामर्थ्यवान आणि उत्पादक प्रवृत्तीची असल्यामुळे ग्रीक संस्कृतीशी टक्कर देतांना तिनें आपली छाप तिच्यावर चांगलीच बसविली. एवढें मात्र खरें कीं या स्वारीमुळे जो सांस्कृतिक झगडा झडला, त्यांतून मौर्यांचें अखिल भारतीय साम्राज्य निर्माण झालें. चाणक्याने नंद महापद्माला पदभ्रष्ट करून चंद्रगुप्त मौर्याला भरतखंडाचा पहिला बादशहा बनविलें. राजकारणपटू चाणक्य हा जातीने जरी ब्राम्हण होता, तरी तो बौद्ध धर्माचा पक्षपाती होता आणि त्याचा राष्ट्राभिमानहि फार उच्च दर्जाचा होता. माझे असे ठाम मत आहे की भारताचे महाभारत (थोर हिंदुस्थान) बनविण्याच्या महत्त्वाकांक्षेचें श्रेय जर खरोखर कोणाला द्यावयाचेंच असेल तर ते श्रीकृष्णाला न देतां चाणक्यालाच देणें वाजवी होईल. इतिहासहि याच मताला भरपूर पाठबळ देत आहे.
अथेन्स अस्तित्वात येण्यापूर्वीच आमच्या वैदिक आर्यांचे वाङ्मय, काव्य, इतिहास, औपनिषदिक तत्त्वज्ञान इत्यादि तयार होऊन बसलें होतें. रोमन लोकांचा प्रकार असा नाही. रोमन लोकांनी इजिप्त आणि कार्थेज यांच्याशी लढलेल्या युद्धांच्या लुटींतूनच ग्रीसच्या काव्याचें कलेचें जनन झालेले आहे. रोमन लोक वास्तविक या वेळी पडत्या काळांत होते. त्यांनी ग्रीस राष्ट्र जिंकून, त्याच्या लहान लहान, इकडे तिकडे विखुरलेल्या व एकलकोंड्या पडलेल्या शहरांपर्यंत आपली सत्ता नेऊन भिडविली. या शहरांची लहान लहान संस्थानें बनली. हीं संस्थानें रोमन जेत्यांच्या दडपणाखालीं बेजार झाली असतांनाहि, त्यांच्याकडून लाभेल तेवढ्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत दिवस कंठीत होती. या मुस्कटदाबींतच ग्रीक संस्कृतीचा उदय झाला. ऑक्सफर्ड आणि केंब्रीजच्या महाविद्यालयांत `ही पहा ती उच्च दर्जाची संस्कृति` (Unique China of the European cupobard) म्हणून मोठ्या दिमाखानें तिची महति सांगण्यांत येते. हिंदुस्थानला या गर्वोक्तीचे काय? एखाद्या `कुछ पर्वा नही` महंताप्रमाणे तो `चलना देव` म्हणून हंसतो. झालें!
चंद्रगुप्त मौर्यानें जी राजकीय सामाजिक आणि धार्मिक घटना केली, तीच पुढे त्याचा नातू सम्राट अशोक याने भरभक्कम पायावर चिरस्थायी केली. इतकेंच नव्हे तर, त्या घटनेच्या प्रसाराचा व्याप त्यानें विस्तृत वाढवून तिच्यावर साम्राज्याचा धर्म म्हणून बौद्धधर्म हा देदिप्यमान कळस चढविला. हिंदुस्थानाच्या इतिहासांतील हा इ. स. पूर्व २७२ ते २३१ चा काळ अत्युच्च राष्ट्रीय वैभवाचा होय.
अशोकाचें साम्राज्य बंगालच्या उपसागरापासून तों थेट काबूलपर्यंत, आणि खाली दक्षिणेस म्हैसूरच्या पलीकडे पालार नदीपर्यंत पसरलेलें होते. अशाकानें विस्तृत पाटबंधारे बांधून, देशांतल्या शेतकीची पिकावट भरपूर वाढविली. या कारकीर्दीत प्राथमिक सक्तीचे शिक्षण हिंदुस्थानांत प्रथमतः सर्रास सर्वत्र सुरू झाले; आणि नालंद येथील जगप्रसिद्ध विश्वविद्यालय साऱ्या जगाच्या ज्ञानप्राप्तीचें मुख्य केंद्र बनलें.
अशोकचे सुप्रसिद्ध शिलालेख आणि त्यांत प्रतिबिंबीत झालेली त्याची नीतिप्रसाराची तळमळ, शाळेत जाणाऱ्या प्रत्येक साक्षर मुलामुलीलाहि आज माहीत आहे. परंतु आमच्या देशांत शेंकडा अवघे ६ लोक साक्षर, बाकीचे ९४ अक्षरशत्रू. जपानी, कोरियन आणि फिलीपाईन लोकांप्रमाणे प्राथमिक सक्तीचें शिक्षण आम्हांला मिळावयाचे आहे. अर्थात् शेंकडा ९४ लोकांना अशोक कोण होता, हें कशानें समजणार?
त्या शिलालेखांचा सारांश थोडक्यांत येथे दाखविणें प्राप्त आहे. आपल्या साम्राज्यांतील यच्चावत् सर्व लोकांच्या माहिती करतां सम्राट अशोकानें देशभर ठिकठिकाणी शिलास्तंभ उभारून, त्यावर सदाचरणाच्या आपल्या आज्ञा खोदून ठेवलेल्या आहेत. सर्वांनी दयाळूपणानें वागावें. सत्य बोलावें. कोणत्याहि प्राण्याची हत्त्या करू नये. आईबापांची आज्ञा पाळावी. आपल्या मित्रांशी, ओळखीच्या माणसांशीं, नातेवाईक, ब्राम्हण, संन्याशी यांच्याशी उदारपणानें विवेकाने आणि परोपकारी वृत्तीनें वागावें. जहाल किंवा फाजील भाषा वापरू नये. अशा मासल्याच्या त्या शिलालेखी आज्ञा आहेत.
अशोकानें बौद्धधर्माला असें वळण दिलें कीं त्यांत `ब्राम्हणांचा आदर` कायम ठेवल्यामुळे, हिंदु भिक्षुकशाही धर्माचा आणि त्याचा कोठे विरोध उरूं दिला नाही. तत्कालीन भिक्षुकशाहीने हिंदुजनांची जी स्थिति राखलेली होती, तिच्यापेक्षा अधिक उच्च व उदात्त अशा प्रगतीकडे अखिल हिंदुजनांनी आपली आत्मोन्नति करून घ्यावी, या अत्युत्तम प्रेरणेचा अशोकाचा हा प्रयत्न होता.
धर्मानें हाक मारतांच, एकजात तरुण तरुणी जनसेवेच्या व धर्मप्रसाराच्या उदात्त ध्येयाने प्रेरीत होऊन, ब्रम्हचर्याची शपथ घेऊन, भराभर भिक्षु आणि भिक्षुणीची दीक्षा घेत असत. अशा स्थितीत बालविवाह आणि पडद्याची रूढी अज्जीबात बंद पडली. फक्त अविभक्त कुटुंब-व्यवस्थेच्या कोंडाळांत मात्र ती चालू असे.
अशोकाने सर्व कांही उत्तम केले, पण एका बाबतींत त्यानें एवढी मोठी घोडचूक केली कीं त्याचे भयंकर परिणाम साऱ्या देशाला पुढे भोगावे लागले. ओरीसा प्रांतांत कलिंगांशी युद्ध करून त्यानें तो प्रदेश आपल्या सत्तेखाली आणला. या युद्धांतील मानवसंहार व रक्तपात पाहून, सम्राट अशोक मनांत इतका द्रवला कीं ताबडतोब त्यानें आपल्या सर्व सैन्याला रजा देऊन, लष्करी खातेंच बंद करून टाकले. हिंदुस्थानाला लष्करी सामर्थ्याची आतां मुळींच जरूर नाहीं, असा त्याचा (गैर) समज झाला.
या लष्करी-संन्यासांतच बौद्ध-सत्तेच्या ऱ्हासाचें मूळ उत्पन्न झाले. राजकीय सत्ता ही नेहमी लष्करी मनगटाच्या जोरावरच टिकायची. परंतु अशोकानें धर्मप्रेमाच्या आवेशांत स्वतःच्या अस्तित्त्वाला मूळ कारण असणारा तो मनगटाचा जोरच उखडून टाकला. लष्करी शक्तीचें पाठबळ गेल्यामुळे, अशोकानंतर मध्यवर्ति बौद्ध सत्तेला ओहटी आगली. तथापि बौद्ध धर्माचा प्रसार मात्र देशोदेशीं भारी झपाट्याने होत गेला. अशोकाच्या बौद्धमिशनऱ्यांनी हे काम पूर्वीं झटून केलेच होते. त्यानंतर कनिष्क राजाच्या मिशनऱ्यांनी तोच क्रम पुढे नेटाने चालविला.
****
भाग ७
इ. स. पूर्व २०० पासून इ. स. ६०० पर्यंत हिंदुस्थानांत सारा गोंधळ माजला होता. लष्करी शक्तीच नष्ट झाल्यामुळे मध्यवर्ति राजकीय सत्ता कमकुवत आणि लंजुर पडली. साऱ्या हिंदुस्थानभर पसरलेल्या साम्राज्याचा आंवर होणे दुरापास्त होऊन बसले. त्यामुळें, ठिकठिकाणी लहान लहान हिंदुराजे वर डोकें काढून आपापली स्वतंत्र राज्यें स्थापूं लागले. मद्रासकडे तेलगूद्राविडी लोकांनी आंध्र राजघराणे निर्माण केलें. इ. स. १५५ साली मिनांडरनें हिंदुस्थानावर स्वारी केली. साराच गोंधळ! कनिष्काप्रमाणे मिनांडरनें बौद्धधर्माचा स्वीकार केला.
इ. स. पूर्व १४७त आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली. या वर्षी शुंग नावाचे एक ब्राम्हणी राज्य निर्माण झाले. आधींच बौद्ध धर्माविरुद्ध सर्वत्र धुसफूस आणि बंडे चालू होतीच. त्यांतच मिनांडरची स्वारी आली, तेव्हां मगधचा राजा बृहद्रथ याने त्याला तोंड न देता स्वस्थ बसला. यामुळें लोकमत एकदम खवळलें आणि हे शुंग घराणें निर्माण झाले. आधींच ब्राम्हणांचा बौद्धधर्मावर पहिल्यापासून मोठा दांत. त्यात हें ब्राम्हणी शुंग घराणे उदयास आलें. मग काय विचारता? सांपडेल त्या बौद्धाला हाण ठोक, असा सारखा छळ सुरू झाला (मिक्षुकी खुनशीपणा फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. प्रसंग पडेल तसे वळते वाकतें, नमते घेऊन, पायाला किंचित सत्तेचा तणावा मिळतांच एका दाताचा सूड बत्तिशी पाडून घ्यायला, भटीवृति सर्पाप्रमाणे डोके धरून बसण्यांत कधीहि कमी करणारी नव्हे. – अनुवादक.) आणि जुन्या जीर्णमतवादी भिक्षुकशाहीचें पुनरुज्जीवन झाले.
भिक्षुकशाही पुनरुज्जीवनाचा हा काळ वाङ्मयाच्या बाबतींत भयंकर उलाढालीचा झाला. भिक्षुकी वर्चस्वाची कायमची थप्पी बसविणारे शेंकडों ग्रंथ या हंगामांत रचले गेले. महाभाष्य व मनुकृत मानव धर्मशास्त्र हे ग्रंथ याच काळात लिहिले गेले. महाभारत आणि रामायण या महत्त्वाच्या काव्येतिहास ग्रंथांत हवी तशी भटी मतांची घालघुसड करून त्यांच्या `सुधारलेल्या` आवृत्त्या याच गोंधळांत बाहेर पडल्या.
या ग्रंथांतून ब्राम्हणांचें जें फाजील स्तोम माजविलेले दिसतें आणि शूद्रांबद्दल जो सर्रास तिटकारा व द्वेष जागोजाग आढळतो, त्यावरून हाच सिद्धांत स्पष्ट होतो की या वेळी ब्राम्हणी राज्यसत्ता जोरावर होती आणि तिने शूद्र राजघराण्यांचा निःपात केलेला होता.
इ. स. ३२०त पुन्हां राज्यक्रान्ति झाली आणि गुप्त राजांचे साम्राज्य सुरू झाले. पहिला, चंद्रगुप्त (२ रा), त्याचा पुत्र समुद्रगुप्त, त्याचा पुत्र चंद्रगुप्त (३ रा) या सर्वांनी हिंदुस्थानची बादशाही गाजवून, देशांतल्या सर्व लहानमोठ्या राजांना जिंकून आपले मांडलीक बनविले. हा ३ रा चंद्रगुप्त म्हणजे ज्याच्या दरबारांत कविकुलगुरू कालीदास उदयास आला, तो विक्रमराजा असें समजतात.
हे गुप्त सम्राट राजे वेद न मानणारे सुधारक हिंदु होते; पण बौद्धधर्मी नव्हते. यांच्या अमदानींत हिंदु भिक्षुकशाही आणि बौद्धशाही तात्त्विक दृष्ट्या परस्परांवर कितीहि वरचढ करीत, तरी एकमेकांशेजारी गुण्यागोविंदानें वागत होत्या. त्या वेळीं बौद्धांतहि तंत्रमंत्रांचे आणि देवदेवतांचे लफड़ें बरेंच घुसलें होतें. महायान (बौद्ध धर्मांत महायान आणि हीनयान असे पुढे दोन पंथ निर्माण झाले होते. - अनुवादक.) पंथाचें केंद्र जी तक्षशिला येथील महापाठशाला, ती याचा पुरस्कार करीत होती. साधनादि आध्यात्मिक तपश्चर्येत यशश्री मिळविण्यासाठी अनेक देव देवतांना आपल्या देवसंग्रहात सामील करून घेण्याची बौद्ध तांत्रिकांनी हिंदुजनांवर पुष्कळच छाप बसविली.
ब्राम्हणी धर्माच्या पुनरुज्जीवनाची पुन्हा या वेळी एक जबरदस्त लाट आली. बौंद्ध स्तूप आणि त्यांचे मठ यांच्या तोडीस तोड म्हणून देवळें बांधण्याचा धूम धडाका हिंदुंनी सुरू केला. भटांनी नाना प्रकारची पुराणे लिहून काढली. मनुस्मृति महाभारत रामायण यांच्या पुनर्लेखनाच्या नव्या आवृत्या देशकाल वर्तमानानुसार लिहून यावेळी पुऱ्या करण्यांत आल्या.
इ.स. ४०६ मध्ये सुप्रसिद्ध चिनी फिरस्ता फा हयान हिंदुस्थानांत आला. हिंदु धर्म आणि बौद्ध धर्म शेजारी शेजारी नांदत आहेत व लोक अहिंसावादी व मद्याला न शिवणारे आहेत. असें त्याला आढळून आलें. त्या वेळीं गरीबांकरितां ठिकठिकाण इस्पितळे होती आणि तेथे रोग्यांना औषधे अन्नपाणी वगैरे मोफत देण्यांत येत असे.
इ. स. ५२८त गोऱ्या हूण लोकांची हिंदुस्थानावर स्वारी आली. त्या वेळी मात्र यशोधर्म उर्फ विक्रमादित्य (२ रा) याच्या सेनापतित्त्वाखाली सर्व हिंदुराजे एकत्र होऊन, त्यांनी त्या हुणांना हुसकाऊन लावले. कित्येकांच्या मते यशोधर्म हाच कालीदासाचा विक्रम असावा.
इ. स. ६०६ ते ६४६ च्या अवधीत हर्ष नांवाचा एक बलाढ्य हिंदुराजा झाला. हा संस्कृत वाङ्मयाचा रसिक पुरस्कर्ता होता. बौद्धजन आणि बौद्धधर्म यांच्याशी त्याचे वर्तन सहानुभूतीचें असे. याच्या दरबारांत ब्राम्हणी धर्म आणि बौद्धधर्म या दोनहि प्रतिस्पर्ध्याचे वादविवाद व चर्चा खुल्या दिलाने चालत असत. या काळापूर्वी अनेक शतकें बौद्धशाहीतील अनेक उत्तम गोष्टींचा आणि तत्त्वांचा हळूहळू स्वीकार करून भिक्षुकशाहीनें त्या आत्मसात् केल्या होत्या. हर्ष राजाच्या कारकीर्दीत तर हे दोनहि धर्मपंथ सारखेच तंत्राळलेले होते आणि दोघांच्या आचारविचारांत विशेषसा फरक कांहींच दिसत नव्हता.
हर्ष राजानेंच ब्राम्हण आणि बौद्ध यांच्यांत एकोपा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्याने ब्राम्हणांना सांगितलें कीं तुम्ही बौद्ध धर्ममार्तंडांना यज्ञोपवित उर्फ जानवें द्यावें आणि बौद्धांना सांगितलें की अत्युच्च सम्मानाचे चिन्ह म्हणून तुम्ही या पवित्र वस्तूचा स्वीकार करावा. ब्राम्हण तर इतके खूष झाले की त्यांनी बुद्धाला हिंदुंच्या दशावताराच्या मालिकेंत सुद्धां गोंवलें.
एवठ्या मोठ्या बलाढ्य, विनयशील, प्रेमळ राजाची इच्छा. ती बौद्धांनी तरी कशी मोडावीं? ब्राम्हण लोकसुद्धां एकोप्यासाठी धडपड करीत होतेच. शिवाय दहा हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी नालंद येथील बौद्धांची महापाठशाला तर सालीना १०० `मौझा`च्या (हे नाणें काय असावें?) खास राजकीय देणगीनें उपकृत झालेली. अशा परिस्थितीत पुढारी बौद्ध धर्ममार्तंडांना हर्ष राजाच्या खास आग्रहावरून भटांची जानवी गळ्यांत अडकवून घेणे भागच पडलें.
एकोप्याच्या तडजोडीची ही योजना निःसंशय बळजबरीची होती. ती तशी असो वा नसो, परंतु बौद्धांनी भटांच्या जानव्यांत मान अडकवून घेऊन आपला नैतिक पराभव करून घेतला, यांत मुळींच संशय नाहीं. इतकेच नव्हे तर त्यामुळे समान भावना आणि जातीभेदाच्या पकडींतून स्वातंत्र्य, या दोन महत्त्वाच्या बौद्ध तत्त्वांना त्यांनी हरताळ फांसला, असेंच म्हणावें लागतें.
बौद्धांचा हा जो नैतिक अध:पात झाला, तो त्यांना या भारत भूमीवर पुनश्चः केव्हांहि सांवरता आला नाहीं. (भटांच्या नुसत्या जानव्याची ब्रम्हगांठ जर एवढी पराक्रमी, तर त्यांच्या प्रत्यक्ष कारस्थानांची खूणगांठ किती? श्रावणीचें शेण खाऊन भटी जानव्यांची दावीं गळ्यांत अडकवून घेणाऱ्या मानवी बैलांनी सावध असावें. धर्म करता कर्म पाठीस लागायचे! लागलेच आहे म्हणा सध्यां. - अनुवादक.) मोठमोठे बौद्ध मठाधिपतीच भटांच्या जानव्यांत पडलें, मग अनुयायांची कथा काय? तेहि मेंढरांप्रमाणे भराभर जानवाळले. ताबडतोब ब्राम्हणी धर्माने भयंकर उचल खाल्ली आणि या पुनरुज्जीवनाच्या रामरंगाड्यापुढे बौद्धशाहीला सपशेल चेपून दडपून जमीनदोस्त करण्याचा मनु उगवला. बौद्धांमध्येच पुढे पंथभेदांची नवनवीं खेंकटी निपजू लागली. त्यामुळे त्यांच्यातहि `बारा पुरभय्ये तेरा चुली`ची फाटाफूट माजली. आणखी दोन शतके पुढे बौद्धशाही कशीबशी टिकली, तरी ती अखेर मरणाच्या दारीं धरणें धरून बसली. कारण, यापुढे बुद्धिवान कर्तबगार आणि शीलवान लोकांची या संप्रदायांत आवक अगदीच बंद पडली. सुप्रसिद्ध चिनी प्रवाशी हूनसंग हा याच वेळी येथे आला होता. त्याने असे लिहून ठेविलें आहे की बौद्धशाही मरणाच्या पंथाला लागली आहे आणि ब्राम्हणशाही मात्र नव्या दमाने आणि ताज्या जोमानें पुनर्जन्म घेत आहे. हिंदुजन प्रामाणिक, सत्यप्रिय आणि कायदा मानणारे असून, ते हत्त्या करीत नाहींत किंवा मादक दारूहि पीत नाहींत.
हर्षानंतर झालेले मगध देशाचे सेन राजे आणि गौड देशाचे (बंगालचे) शशांक राजे हे सर्वस्वी आपल्या ब्राम्हण मंत्र्याच्या ओंजळीने पाणी पिणारे निपजले. अर्थात् ते आपल्या बौद्ध प्रजेला तलवारीच्या धारेवर धरू लागले. सरकारी देणग्या बंद करण्यांत आल्या, तेव्हां नालंदची जगप्रसिद्ध बौद्ध युनिवर्सिटी रसातळाला गेली. मोठमोठे मठ, भिक्षुणींची वसतीगृहें संघ मोडून टाकण्यांत आले आणि तेथली सर्व मालमत्ता जप्त करण्यांत आली. बौद्ध जात मानीत नसत, म्हणून त्या `नि-जात्या`ची सर्वजण टर उडवून छळ करीत. ब्राम्हणी धर्माच्या पुस्तककर्त्यांना तर इतका चेव आला की त्यांनी बौद्ध संस्कृतीच्या सर्व कलांची, वाङ्मयाची, असेल नसेल त्याची राखरांगोळी करण्याचा धूमधडाका चालविला. फार काय, पण बौद्धजनांना पूज्य व वंदनीय असलेल्या पवित्र वस्तू व चिन्हें त्यांनी भ्रष्ट केली; कोठें त्यांची अवहेलना व अपमान केला आणि कांहीं तर नाश करून टाकल्या.
८ व्या ९ व्या इसवी शतकांत साऱ्या हिंदुस्थानभर शेंकडों लहान लहान राज्यें पसरली होती. कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाही. मध्यवर्ति राजकीय नियंत्रणाची सत्ता अजिबात नष्ट झालेली. अशा अवस्थेत परकीय सिथियन लोकांच्या टोळ्यांवर टोळ्या येऊन रजपुतान्यावर कोसळल्या आणि तेथल्या आर्य राज्यांना उखडून टाकून, त्यांच्या जागी कायमच्या वसती करून बसल्या. या परक्या पाहुण्यांशी मिळतें घेणे भागच होतें. (भिक्षुकशाही परक्यांशी मिळते घेण्यांत मनाची फार कोवळी आणि उदार. स्वदेशबांधवांशी शतकानुशतकें वैराचा वणवा फुलवीत बसेल. पण जबरदस्त परक्यांशी मनधरणी करण्यासाठी पळाचाहि विलंब तिला सोसवत नाहीं. आजहि हेंच चालले आहे. - अनुवादक.) हे रजपुतानी सिथियन जेते ब्राम्हणी धर्माशी मित्रत्वाच्या नात्याने वागत आहेत, असे आढळून येतांच, भटाब्राम्हणांनी त्यांच्याशी लगट करून, त्या सर्वांना हिंदु धर्माची दीक्षा दिली आणि त्यांच्या गळ्यांत यज्ञोपवितहि अडकविलें. हे सिथियन लोक जात्या बलाढ्य लढवय्ये असल्यामुळें, प्राचीन क्षत्रियांची (सिथियनांना हिंदु करून चतुवर्णापैकी क्षत्रियांची जागा त्यांना देण्यांत आली. पण त्यांची जात कोणती? जातीशिवाय हिंदु जगेल तरी कसा? मोठी अडचण पडली. अखेर तुम्ही राजपुत्रच आहांत, तेव्हां तीच तुमची जात असें ठरविलें. राजपुत्राचे झाले राजपुत आणि राजपुताचे बनले रजपूत. - अनुवादक.) जागा भरून काढण्यास हे सर्वतोपरी लायक आहेत, असें भिक्षुकशाहीने ठरवून टाकलें. हिंदुधर्म हा कधींच मिशनरी धर्म नव्हता, असे म्हणणारे लोक खोटे बोलतात, हे यावरून स्पष्ट सिद्ध होत नाहीं काय?
राजपुतान्यांतले हे सिथियन वसाहतवाले म्हणजे हिंदुस्थानच्या इतिहासांत गाजलेले सुप्रसिद्ध रजपूत होत. इ. स. ७१२ सिंधी मुसलमानांच्या स्वारीला या रजपुतांनी सामना देऊन पिटाळून लावले. या त्यांच्या हिंदसेवेच्या पहिल्याच यशस्वी धडाडीमुळे रजपुतांचा सर्व देशांत मोठा गौरव झाला आणि तेव्हांपासून त्यांना राजसदृश असे उच्च वैभव प्राप्त झालें. दिल्ली आणि कनोजे ही इतिहासप्रसिद्ध शहरेंहि त्यांच्या लवकरच ताब्यांत गेली.
त्या वेळेचे रजपूत राजे व्यक्तीशः जरी रणशूर आणि बलाढ्य असत, तरी आंतून से सर्व अहंपणाने आणि परस्पर मत्सरानें सडून गेलेले असत. त्यांची राज्ये लहान लहान व इतस्ततः पांगलेली असत. दळणवळणाची साधने व प्रवासायोग्य सडका यांचा पूर्ण अभाव असल्यामुळे, त्यांना परस्पर सहायकारी अशा संयुक्त सत्तेची घटना करता आली नाहीं. किंवा एखाद्या शत्रूवर संघटनेने चाल करून जाण्याइतक्या परिणामकारक शिस्तीची लष्करी व्यवस्थाहि त्यांना लावतां आली नाहीं. त्यामुळे त्या वेळी मुसलमानी स्वाऱ्यांनी हिंदुस्थानांत पोखरण घालण्याचा जो उपक्रम केला. त्याला सामना देण्याच्या कामीं हे रजपूत पराक्रमी असूनहि निरूपयोगी ठरले.
फाजील स्तुतिपाठ आणि भरंसाट लाळघोटेपणा यांत भिक्षुकशाहीचा ब्राम्हण फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. पराक्रमी रजपुतांची मर्जी संपादन करण्यासाठी भटाब्राम्हणांनी लवकरच एक नवीन युक्ती शोधून काढली. हिंदुत्व आणि यज्ञोपवित यांचा प्रसाद त्यांना आधींच मिळालेला होता. आतां, रामायण महाभारतादि काव्येतिहास ग्रंथांतल्या आणि पुराणांतल्या खऱ्याखोट्या प्राचीन क्षत्रिय राजघराण्यांशी व देवदेवतांशी या अनेक रजपूत राजांचे संबंध जोडणाऱ्या बनावट वंशावळींची भेंडोळी (हिंदुंची अशी एकहि जात सांपडणार नाही की जिच्या उत्पत्तीचे मूळ थेट ब्रम्हदेवाच्या पोटांत घुसलेलें नाही! मैल मैल लांब वंशावळीच्या अभिमानांत गर्क असणाऱ्या हिंदु जनांच्या जातिवंशांत कसकशी काल्पनिक कलमें लागलेली किंवा लावली गेलेली असावी, याचा या गोष्टीवरून फार छान खुलासा होतो. - अनुवादक.) ब्राम्हणांनी तयार करून, त्या सर्वांना अगदी खूष करून सोडले. या फाजील प्रतिष्ठेनें रजपूत राजे मनस्वी फुगून गेले. त्यांच्या भोवती पसरलेल्या सर्वसंपन्नतेमुळे ते चैनबाजी व ख्यालीखुशालीत दंग झाले. अशा स्थितीत आपल्या दारिद्यग्रस्त प्रजेची हालहवाल काय आहे, हें या खुशालचेंडू राजांना कसे दिसावें? आणि दिसले तरी त्यांनी कां पहावें? नाना प्रकारच्या विकार विकल्पांत मग्न असणाऱ्या या रजपूत राजांची मनें ब्राम्हणांनी बौद्धजनांच्या विरुद्ध हवी तशी कलुषित करून खवळून सोडली. या चिथावणीखोर ब्राम्हणांत, रजपुतांना अत्यंत पूज्य असलेल्या, आद्यशंकराचार्यासारख्या जाडी प्रस्थानेंच पुढाकार घेतल्यावर काय होणार नाहीं?
इ.स. ७५०त दक्षिण हिंदुस्थानांत कुमारील भट्ट नामक ब्राम्हण धर्ममार्तंडाने बौद्धांचा नायनाट करण्याचा पायंडा घालून ठेवलेला होताच. इ.स. ८३० मध्ये श्रीशंकराचार्यांनीं त्याच पायंड्यावर पाऊल ठेवून, रजपूत राजांची मनें बौद्धांविरुद्ध खवळून सोडण्याची कामगिरी हातीं घेतांच, काश्मीर नेपाळ पंजाब रजपुतांना आणि गंगा यमुना नद्यांमधल्या बिहारादि उत्तर पश्चिम व मध्य हिंदुस्थानच्या सर्व प्रदेशांतून सर्रास बौद्धजनांच्या छळांचा आणि ससेहोलपटीचा भयंकर उपक्रम, रजपूत राजांनी आणि त्यांच्या ब्राम्हणी-हिंदु सहाय्यकांनी सुरू केला.
बिचाऱ्या बौद्धांची स्थिति या वेळी मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी होती. त्यांची खेडी उद्ध्वस्त करण्यांत आली. घरेदारे जाळली, लुटली गेली. बायकांची अब्रू घेण्यात आली. पुरुष आणि मुलांना कोठे हद्दपार केले, तर कोठे त्यांची सर्रास कत्तल करण्यात आली. अशा या हलकल्होळांतून जे बौद्धजन कसे तरी लपून छपून वाचले, त्यांना समाज व व्यवहार-बहिष्कृत करून, लोकवस्तीपासून पार दूर पिटाळून लावले. अर्थात् त्यांना कमालीतली कमाल नीच अवस्था प्राप्त झाली. उदरनिर्वाहासाठी सुद्धा त्यांना साध्या माणुसकीला साजेशोभेशा सामान्य शिष्ठतेचीहि बंदी करण्यांत आली. आज आमच्या डोळ्यांपुढे वावरणारे हारी, डोम, मच्छी, चांभार, केवरा, बागडी, नामशूद्र, महार, धेड, मांग इत्यादि अस्पृश्य जनांचे संघ यात छळवाद होऊन बहिष्कृत पडलेल्या बौद्धजनांचेच अवशिष्ठ भाग आहेत.
कुमान नेपाळ इकडे हल्ली ज्या दंतकथा, गोष्टी व इतिहास ऐकण्या वाचण्यात येतो, त्यांवरून बौद्धांच्या छळांत खुद्द शंकराचार्य आणि त्यांचे अनुयायी यांचा प्रत्यक्ष संबंध किती होता, हे स्पष्ट दिसून येतें. खुद्द शंकराचार्यांच्या आज्ञेवरून कथूरिया राजांनी गरवाल कुमान आणि नेपाळांतून बौद्धांना पार पिटाळून लावले. त्यांचे मोठमोठे मठ वगैरे होते, ते सारे शंकराचार्यांना दान दिले व त्यांवर त्यांच्या अनुयायांची स्थापना केली. त्यांचे वंशज आजहि त्या मठांचा उपभोग घेत आहेत. शंकराचार्यांनी बौद्ध भिक्षुंना मुद्दाम पशुयज्ञ करावयाला लावले आणि ब्रम्हचर्य व्रताच्या संकल्पाने राहणाऱ्या भिक्षु, भिक्षुणीवर विवाहाची बळजबरी केली.
महात्मा गौतम बुद्ध हा महान् योगी पुरुषोत्तम होता, हे सर्वश्रुतच आहे. तो निर्वाणपदाला गेल्या नंतर अनेक शतकांनी, त्याच्या अनुयायांना त्या दिव्य महात्म्याचे कांही सद्गुण आणि त्याच्या मूर्तीची प्रतिमा चितंनासाठी, योगधारणेसाठी किंवा एखाद्या साधनासाठी, दृष्टीपुढे ठेवणे सोयीचे व अगत्याचे वाटू लागले. तक्षशिळा येथील बौद्ध महापाठशाळा म्हणजे त्या वेळी महायान पंथाचे आद्यपीठ समजली जात असे. त्या पाठशाळेने महात्मा बुद्धाच्या मूर्तीच्या प्रतिमेशिवाय आणखी कमळ व सहा योगचक्रें चिंतनांत आणण्याची शिफारस केली. तक्षशिळा महापाठशाळेचा मुख्य अध्यापक सुप्रसिद्ध तत्त्ववेत्ता नागार्जून, त्याच प्रमाणे इतर प्रोफेसर, शिक्षक, गॅज्युएट, अंडर गॅज्युएट वगैरे मंडळी ज्या या चिन्हांच्या केवळ कल्पनाचित्रांवर चिंतन करीत, त्याच चिन्हांची प्रत्यक्ष दगड माती व धातूंची चित्रे चितनार्थ उपयोगांत आणण्याचा उपक्रम गांधार येथील महापाठशाळेत सुरू झाला. याचा परिणाम असा झाला की बुद्धाचे पुतळे आणि योगचिन्हांची कोरीव दगडी चित्रे यांचा सर्व बौद्ध मंदीरांत, मठांत आणि संघांत सर्वत्र सपाटून प्रसार झाला. जेथे जेथे म्हणून बौद्धांची वसती असे, अशा सर्व ठिकाणी बुद्धाचे पुतळे आजहि आपल्याला दिसतात, याचे कारण हेंच.
शंकराचार्य हे शंकराचे कट्टे भक्त. चिंतनमग्न बुद्धाची पांढरी मूर्ती थोड्याशा फेरबदलानें शंकराची मूर्ती बनविणें, हें काम फारसे कठीण नव्हते. शंकराचार्यांच्या आज्ञेने जेथें जेथें अशा बुद्धाच्या मूर्ती आढळल्या, त्यांच्या गळ्यांभोवती सर्पांची वेटाळी खोदून बसवून, त्यांना शंकराच्या मूर्ती बनविल्या. (कित्येक बौद्ध लेण्यांत तर बुद्धाच्या मूर्ती उखडून टाकून तेथे शंकराच्या पिंड्याहि स्थापन केलेल्या आहेत. पुण्यानजीक भांबुर्ड्याच्या लेण्यांत हाच प्रकार दृष्टीस पडतो. - अनुवादक.)
बौद्ध धर्माचें हिंदुस्थानांतून उच्चाटन व हाकालपट्टी करण्याच्या कामीं क्रूरतेचे, राक्षसीपणाचे, देव देवतांच्या लुटालुटीचे आणि प्रतिष्ठाभंगाचे या पेक्षा अधिक काय काय भयंकर अत्याचार घडले असतील. त्यांची आज आपण नुसती कल्पनाच केलेली बरी. त्या काळीं सहिष्णुता फार महाग झाली होती. खुद्द शंकराचार्यांना सुद्धा तिचे महत्त्व भासलें नाहीं. आपल्या रुद्र दैवताप्रमाणे रुद्रावतार धारण करून त्यांना बौद्धशाहीची पाळेंमुळें उखडून काढायची होती. बौद्धधर्माचा सत्यानाश केल्याशिवाय ब्राम्हणी धर्माची पुनर्घटना होणेच शक्य नाही. अशा कल्पनेचे वारे त्यांच्या आंगांत संचरलें होते.
अशा रीतीने शंकराचार्य आणि भिक्षुकशाही यांचा जयजयकार झाला. अखेर त्यांनी जिंकली. पण या विजयाने साधले काय? छोट्यामोठ्या हिंदु राजांच्या असंख्य शिपुड्र्यांना भाडोत्री मदतीला घेऊन, हिंदुजनतेचा केवळ पाठकणा असणाऱ्या बौद्धांचे निर्मूलन करण्यांत मिळालेल्या यशाचे परिणाम काय झाले, हें `आज तुमच्यावर फिरत असलेल्या परिस्थितीच्या वरवंट्याकडे पहा` असे काळच बोट दाखवून सिद्ध करीत आहे.
कुमारील भट्ट आणि शंकराचार्यांसारखे धर्मक्रांतिकारक लोक आपल्या ध्येय-साधनाच्या आवेशाच्या भरात एक गोष्ट अज्जीबात विसरले की माणसें येथून तेथून सारी मर्त्य, त्यांनी हातीं मिळालेल्या सत्तेच्या जोरावर शारीरिक बळजबरीने आणि जुलूम जबरदस्तीने कोणाची कितीहि हानी केली, तरी दुधारी तलवारीप्रमाणें ती केव्हांना केव्हा तरी उलट फिरून प्रत्याघाताचा सूड उगविल्याशिवाय राहणारी नव्हे.
परंतु शंकराचार्य हे तसे ऊर्ध्व महात्वाकांक्षी होते, तसेच बुद्धिंमत्तेत तें सवाई बृहस्पति होते. विध्यंसक शंकराप्रमाणे रुद्राचें संहारकार्य करूनच ते थांबले नाहीत, तर त्यांनी ब्रम्हदेवाचीहि भूमिका घेऊन विधायक कार्य केले. ब्राम्हणी धर्माचे पुनरुज्जीवन करतांनाच, त्यांनी अभिनव भारत (New India) निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हिंदुत्वाला नवजीवन दिले, असे म्हणतात. वेदान्ताची फोड करून त्यांनी हिंदुधर्माला नितांत रमणीय अशा एकतान तत्त्वज्ञानाचे स्वरूप दिलें. परंतु हें तत्त्वज्ञान अतिसूक्ष्म व दुर्बोध असल्यामुळे, सामान्य जनतेच्या मनावर त्याची कांहींच छाप बसली नाही. विशेषतः जनतेच्याच हाडारक्तामासाचे जे बौद्धजन त्यांच्या शंकराचार्यांनीं ज्या कत्तली करविल्या व अखेर त्यांचा नायनाट केला, तें शल्य जनतेच्या हृदयांत इतक्या तीव्रतेने सलत होतें की शंकराचार्यांच्या कोणत्याहि चळवळींत लोकांनी कसलाहि भाग घेतला नाही. ते सर्व उदासीनच राहिले.
तक्षशिला येथील महापीठाने जाहीर केलेल्या अभिनव बौद्धधर्माच्या तत्त्वांचा हिंदु जनतेच्या मनांवर इतका परिणाम झालेला होता की, शंकराचार्यांचा वेदान्त सर्वत्र गर्जत असतांहि, लोकांत मूर्तीपूजनाचा जुना प्रघात धूमधडाक्याने चालूंच राहिला. इतकेंच नव्हें तर तंत्रमंत्रांचे सर्व भेसूर प्रकार तें पाळीत होते. या वरून हे स्पष्टच होते की अभिनव भारत निर्माण करण्याची शंकराचार्यांची जी महत्वाकांक्षा होती ती सपशेल फसली. आचार्य समाधिस्त झाल्यानंतर त्यांच्या अनुयायांत जी अधःपाताची कीड पडली, ती पुढे दिवसेंदिवस भयंकर प्रमाणांत वाढत गेली. विशेषतः आचार्यांनी मायावादाची जी कल्पना प्रचलित केली. तिचा हिंदु समाजावर इतका घाणेरडा परिणाम झाला की जिकडे तिकडे आढ्याला तंगड्या टेकणारे ऐदी आणि नशीबाला हात लावणारे निराशावादी यांचा सुळसुळाट उडाला. (आजहि हा मायावाद हिंदुंच्या संसारांत निराशेची भरपूर फोडणी देतच आहे. - अनुवादक.)
राष्ट्रांतले लोकच जर दारिद्रयानें आणि बेबंदशाहीने चिरडलेले असतील; हव्या त्या जबरदस्ताच्या लुटारूपणाला बळी पडण्याइतके हतबल बनले असतील; शिक्षणाच्या अभावामुळे त्यांच्या बुद्धीची वाढ खुंटलेली असेल; आणि अन्नाच्या दुष्काळामुळे त्यांचा शारीरिक जोम व सोशीकपणा नष्ट झाला असेल तर कोणी कितीहि मोठा बुद्धीवान् व पराक्रमी पुरुष असला, तरी तो असल्या राष्ट्राला कसा आणि किती वांचणार?
हवी तशी उधळपट्टी, आधाशीपणा, बेफाम विषयासक्ती आणि मनसोक्त सुरापान या व्यसनांनी जर वाटेल त्या मनुष्याचा अधःपात होतो, तर ज्या राष्ट्रांत अशीं व्यसनाधीन माणसें बोकाळतात, त्या राष्ट्रांचा कां होणार नाहीं?
१० व्या व १२ व्या शतकांच्या दरम्यान रजपूत राजांमध्ये अगम्यगमनाचे व्यसन व आपापसांतील द्वेष भयंकर भडकलेले होते. पुरुषांना स्त्रीजातीचा आदर मुळींच राहिलेला नव्हता. त्यांची कामासक्ती इतकी विलक्षण बेफाम झाली होती की स्त्रिया म्हणजे कामशांतीची यंत्रे, यापलीकडे ते कांही अधिक समजतच नसत. या पाशवी विषयलोलुपतेच्या अतिरेका बरोबरच, संपत्तीची हाव आणि स्वतःसाठी एखाद्या लहानशा राज्याचा स्वतंत्र प्रदेश मिळविण्यासाठी प्रत्येक रजपुत तरुण राजपुत्रांची सारखी धडपड सुरूं असे.
या तरुण राजपुत्रांच्या बापांच्या-रजपुत राजांच्या-जनानखान्यांत राण्या आणि रखेल्या यांच्या टोळ्याच टोळ्या ठेवलेल्या असत. त्यामुळे कोणतीहि एखादी राणी अथवा रखेली आपल्या त्या दण्डधारी पतिराजाची फारशी कसलीहि किंमत बाळगीत नसे.
हिंदुस्थानांतल्या हिंदु राजांच्या दरबारांत (राजवाड्यांत) मोठमोठ्या सरदारांच्या आणि प्रतिष्ठित नागरीकांच्या बायका मुलींना आमंत्रणे येत असत. हुजूर स्वारींची जिच्यावर नजर जाईल तिची राजशय्यामंदिरांत रवानगी झालीच पाहिजे. त्यासाठी हव्या त्या खटपटी लटपटी करण्यांत येत असत. प्रसंगी, त्या स्त्रीची मनधरणी करण्यासाठी खुद्द पट्टराणीलाहि कसल्या तरी शिक्षेच्या अथवा मृत्यूच्या भयानें, कुंटणपणा पत्करावा लागे. स्त्रीजातीची इतकी बेइज्झत व अवहेलना होऊ लागल्यावर त्यांनी बंडाचा थैमान कां करूं नये?
खुद्द हुजूर स्वारीच प्रेमपात्रांच्या शिकारीत सदैव बहकलेली, तर जनानखान्यांतील राण्यांनीच पातिव्रत्याची एकनिष्ठ जोपासना काय म्हणून करावी? त्यांचीहि प्रेमपात्रे (लव्हर्स) असत. राजवाडेच जेव्हां या महापातकांनी आरपार सडून गेले तेव्हा साहजिकच त्यांचा घाणेरडा सांसर्ग थेट सरदार दरकदार नागरीकांच्या घरांपर्यंत पसरत गेला. सरदार व दरकदारादि लोकांना राजाकडून जसे वागविण्यांत येई, तसेच हे लोक आपल्या हाताखालच्या लोकांना व मित्रांना वागवीत. [म्हणजे राजानें जर सरदाराची बायको, मुलगी अथवा सून पळवून नेली, तर तो सरदार आपल्या समान दर्जाच्या, किंवा हाताखालच्या लोकांवर अथवा मित्रांवर तोच प्रयोग करीत असे. - अनुवादक.] इतकेंच नव्हे, तर राजाच्या कुकर्माचा यथातथ्य सूड उगविण्यासाठी हे सरदार लोक आपल्या कारस्थानांची सूत्रे थेट राणीवशांत आणि जनानखान्यांतल्या वाटेल त्या राजपत्नी किंवा रखेलीपर्यंत नेऊन भिडवीत असत.
छिनाल कंपूंत एक म्हणच सुरू झाली होती-आणि त्या काळीं छिनाल नव्हता कोण? -की हवी ती विवाहित अथवा अविवाहित तरुणी, तोंडानें नुसती शीळ घालतांच गळ्यांत येऊन पडते.
आणि आमचे ब्राम्हण भटजी? समाजाच्या या भ्रष्ट अध:पतनाला त्यांनी कांहींच का हातभार लावला नसेल? कदाचित ही वस्तुस्थिती सुधारण्याच्या अथवा तिला आळा घालण्याच्या कामी ते मतिमंद तर नव्हते बनले?
अखेर मजल येथवर आली. तरुण राजपुत्रांना स्वतंत्र प्रदेश आणि स्वतंत्र राज्य यांच्या प्राप्तीची एवढी भयंकर लालसा उत्पन्न झाली की त्यासाठी आपला राज्यकर्ता बाप शयनमंदिराकडे जात असतां, किंवा अनेकांपैकी आपल्या एखाद्या आईसह निद्रावश असतां, त्याचा खून करण्यालाहि ते मागें पुढें पहात नसत. विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या घाणेरड्या दुष्कृत्यांत या आयांचे खुनशी राजपुत्रांना सहारा मिळत असे. शेकडों राण्या. आपल्या प्रौढ मुलाला राजपद मिळावे, अशी प्रत्येकीची इच्छा. पतिव्रत्य पातळ झालेले. निष्ठेचे शून्य. नीतिमत्ता तर कोणाच्या गांवीं नाहींच. त्यांत राजकीय सत्तेची आसुरी लालसा! मग काय होणार नाहीं? अखेर, राजपुत्राने राजाचा खून करावा, राजपद बळकवावें, सावत्र आया व सावत्र भावांना ठार मारून टाकावे. ही सर्व राज्यांत एक राजमान्य रूढीच होऊन बसली. खुनशी राणीच्या दृष्टीने या रूढींत वावगे काहीच नसे. राजवधाचा प्रयोग पहिल्या प्रथम आपल्या पुत्रानेच करावा, अशी तिची महत्वाकांक्षा असे. कारण, आपला पुत्र राजपदाधिकारी झाला की, राजमातेचें थोर पद आयतेच आपल्या पायांशी चालून येते.
बिनबोभाट खून पाडण्याचा आणखी एक प्रकार असे. आपल्या राजपतीची कामतृष्णा शांत करण्यासाठी राजपत्न्या कुंटिणीचे काम तर करीतच असत. पण आपल्या नवऱ्याचा बिनबोभाट खुन करण्याच्या वेळी, चांगल्या निरोगी स्त्रिया शयनमंदिरांत पाठविण्याऐवजी, ब्राम्हण भिक्षुकांच्या आणि जडीबुट्टीवाल्यांच्या सहाय्यानें एखादी गांवभवानी वेश्या हुडकून काढीत. हे सहाय्यक त्या वेश्येच्या शरीरांत जालीम विषाची योजना करून ठेवीत. त्यामुळे संभोगस्पर्श होतांच राजा चटकन मरत असे, किंवा हातपाय झाडून राम म्हणत असे.
वाचकहो! मुसलमानांच्या स्वाऱ्या बिनधोक या देशावर का झाल्या, आणि हिंदुस्थानच्या काळजाला त्यांना सफाईत हात कां घालता आला, याची आणखी कारण-मिमांसा आपणांपुढे केलीच पाहिजे काय? मुसलमानांच्या स्वाऱ्या होण्यापूर्वीच अनेक वर्षे हिंदुसमाजपद्धति सपशेल सडकी कुझकी होऊन बसली होती. प्रतिकार करण्याची कांहीहि शक्ती तिच्यांत उरलेली नव्हती. आंगावर शत्रू चालून आला असता, त्याला संघटित तोंड देण्यासाठी चटकन् एकवटण्याची आमची शक्ती आणि बुद्धीच ठार मेलेली होती. अर्थात् असल्या निर्जीव सांगाड्याला जमीनदोस्त व्हायला काय पाहिजे? एक धक्का बसतांच पत्त्याच्या किल्ल्याप्रमाणे धडाड सारा बाजार कोसळला!
महाभारताच्या काळापासून आमच्या ब्राम्हणी संस्कृतीचा प्रवाह प्रगतीच्या मार्गाने एकसारखा वहात होता, त्यामुळें सारी जनता दुधामधाच्या समृद्धीत सुखसंपन्न होती, पण अवचित हे म्लेंच्छ मुसलमान आले आणि त्यांनी आमच्या हिंदुराष्ट्राची धूळधाण केली; असा एक मूर्खपणाचा आणि चुकीचा समज अझून आमच्या लोकांत आहे. त्या बिचाऱ्यांना वाटते की रामाचा आणि युधिष्ठिराचा काळ संपताच एकदम मुसलमानी टोळधाड या देशावर कोसळली आणि त्यांचा रियासतीला सुरवात झाली. मुसलमानांचा या देशांत प्रवेश होण्यापूर्वी शेंकडों शतकांचा काळ गेला. हे त्यांच्या लक्षांत येतच नाहीं. परंतु मुसलमान येथे येण्यापूर्वी बराच काळ सारा हिंदु समाज भयंकर चिळसवाण्या स्थितीत भ्रष्ट होऊन नासला सडला होता, म्हणूनच मुसलमानांना हा देश काबीज करून येथे राज्यकर्ते म्हणून वसती करता आली.
वाचक मित्र! हिंदु जनांचा ऱ्हास आणि अधःपात कसकसा होत गेला हे मी आतांपर्यंतच दाखविले. यासाठी हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासाची रूपरेषा मला जशी दिसली तशी ती आपल्या पुढे मांडली आहे. विषय पडला मोठा आणि माझा निबंध पडला छोटा, तेव्हां गतेतिहासाचें हें सिंहावलोकन मला धावत्या दृष्टीने करावे लागले आहे, याची मला जाणीव आहे.
गेल्या अनेक शतकांच्या कटु अनुभवानें शहाणें होऊन, आपल्या समाजाची विशेष सौख्यकारक सुधारणा करण्याची आज तरी हिंदुजन कांही खटपट करीत आहेत काय? प्रगतीसाठी उत्क्रांतीचे त्यांचे कांहीं प्रयत्न सुरू आहेत काय? मला तर कोठे कांही दिसत नाही. आपले घर ठाकठीक व्यवस्थेत बसविणारी एकहि समाजोद्धारक चळवळ सध्यां हिंदु समाजांत चालू असल्याचें मला दिसत नाही आणि माझ्या ऐकीवांतहि नाहीं.
राष्ट्र दृष्टीने हिदुस्थानाचा पूर्वी जो अध:पात झाला, आणि आजहि जो चालूंच आहे, त्यावर या निबंधासाठी मी आणखी विचार करण्यांत मग्न असतो, मला गाढ झोप लागली. भारतमाता माझ्या समोर उभी आहे आणि ती मला एक निर्वाणीचा संदेश देत आहे, असें मला स्वप्न पडले. हा
भारतमातेचा संदेश
येथे नमूद करून, मी आपल्या निबंधाचें भारतवाक्य करतों.
"ज्या गोष्टी तुझ्या मनाला आज त्रस्त करीत आहेत, त्याच हिंदुस्थानच्या दुर्दैवाला मूळ कारण आहेत. पण त्यांचा निरास करण्याचे आजपर्यंत कोणाला सुचलें नाहीं व साधलेंहि नाहीं. तुमच्या समाजाच्या एका भागानें दुसऱ्या भागावर हवा तो जुलूम, हवा तो अन्याय करावा, आणि त्या अन्यायपीडित संघाने तोंडांतून प्रतिकाराचा एक ब्रसुद्धां काढू नये, मिटल्या तोंडीं सर्व आघात सहन करावे, या शेळपटपणांतच तुमच्या राष्ट्रीय दुर्दैवाची खरी मख्खी आहे, हें तुला अझूनहि उमगूं नये ना? जुलूम जबरदस्तीखाली जेर झालेल्या कष्टी लोकांनींच टरारलेल्या मनगटाचा ठोसा ठणकाऊन आपल्या कष्टांचे परिमार्जन का करून घेऊ नये?"
"तुमची ती काशी आणि इतर यात्रा करण्याची क्षेत्रें नीट पहा. अनन्वित पापाचरणांची घाणेरडी गटारें, मोऱ्या, नरककुंडे होऊन बसली आहेत! असल्या या भिकार स्थळांच्या महात्म्याची कुंटणगिरी करणें, हेंच का तुम्हां हिंदुजनांचे आज ध्येय? एकमेकांविषयीं तुसडेपणा, आणि कोणाची कोणाला कधीं कळ यायची नाही असला बेदर्दीपणा तुमच्यात बेफाम बोकाळल्यामुळे, आज असा कोणता सद्गुण आहे, कोणते पुण्य कर्म आहे, की ज्याचा या हिंदुस्थानांत हरघडी चेंदामेंदा होत नाही? लोकांत मुळी जिव्हाळ्याची कळकळच उरली नाही. न्याय अन्याय, खरें खोटें, योग्य अयोग्य पारखण्याची तुमच्या आत्म्याची मुळीं संवेदनाच मेलेली. मग बाबांनों, सत्याकरितां आणि न्यायाकरितां प्राणार्पण करण्याची गोष्ट कशाला? `माझा मी मुखत्यार. तुला काय करायचे?` ही ज्याची त्याची मगरूरी या व्यसनापुढे सदभिरूची, तडजोडीची उदार वृत्ती आणि परमतसहिष्णुतेचा दिलदारपणा यांची पार माती होऊन गेली आहे.``
"तुमच्या स्वतःच्याच दुष्कर्मानें निर्माण केलेल्या पापाचरणांच्या उकीरड्यांच्या राशी प्रथम या देशांतून निपटून काढा. हें काम तुमचेच आहे. तें तुम्हांलाच केलें पाहिजे. धर्म, कला, वाङ्मय, राजकारण, व्यापार, धंदा, व्यवसाय, बाजार इत्यादि सर्व क्षेत्रांत, फार काय पण लोकव्यवहाराच्या प्रत्येक बारीक सारीक बाबींत जेवढे म्हणून लफंगे लुच्चे भोंदू दांभिक टगे आढळतील, त्यांना ठिकच्या ठिकाणी ठेचल्याशिवाय सोडूं नका."
``बुद्धिमान, संपत्तिमान, वजनदार, प्रतिष्ठित आणि लोकनेतृत्वाला लायक असे लोक हे प्रत्येक देशाचे जिम्मेदार (ट्रस्टी) होत. देशाचा त्यांच्यावरच सारा भार व भरंवसा असतो. तुमच्या हिंदुस्थान देशांत असले लोक कांही स्वतःच पक्के लाळघोट्ये आहेत, तर कांही लोकांच्या लाळघोटेपणाच्या पचनी पडणारे आहेत. सत्य तत्त्वांऐवजी असल्या झब्बूंचे देव्हारे या देशांत पुजले जात आहेत. पूजा करणारे आणि पूजा करून घेणारे, दोघेहि वाममार्गी. ज्यांच्यापाशीं कांही तरी आहे त्यांनी ज्यांच्यापाशीं काहींच नाहीं त्यांच्यासाठी आपल्या सर्वस्वाचा होम केला पाहिजे. बाबारे, आज या भारतमातेला स्वार्थत्यागी लोकांची गरज आहे. आत्मयज्ञ करणारे वीर मला पाहिजेत. लोकशिक्षणाचें आणि लोकनेतृत्वाचे काम ज्यांनी हाती घेतले आहे, त्यांनीच आत्मयज्ञाची शिकस्त केली पाहिजे."
"तुमचे धार्मिक विधी, आचारविचार आणि तुमच्या जातिविषयक रीतीभाती आज अगदीं हलकट बनलेल्या आहेत. कारण त्यांत सत्याचा लवलेशहि उरलेला नाहीं. अरे, ब्राम्हणधर्माचें खरें स्वरूप म्हणजे काय समजतां? निर्भेळ सत्याचा आणि स्वार्थत्यागाचा अर्क पाहिजे अर्क. तरच त्याला सनातन धर्म हें नांव शोभेल. असलाय धर्म तुमचीं भटें भिक्षुकें तुम्हांला शिकवितात काय? मुळीच नाही. त्रिवार नाही. जेथें धर्म कशाशीं खातात हेंच त्यांना माहीत नाहीं, तेथे ते शिकवणार तरी काय आणि अध्यात्माची त्यांना दृष्टी आल्याशिवाय `वर्णाश्रम धर्मा`चा खरा अर्थ त्यांना उमजणार तरी काय!"
"शक्तीपूजा म्हणजे काळ्या फत्तराच्या एका अक्राळ विक्राळ देवीची, भरंसाट भेसूर प्रकाराने आज तुम्ही करीत असलेली पूजा नव्हे. तुमच्या सामाजिक घाशीरामीखाली दडपून पडलेल्या देशांतील स्त्रीजातीच्या पवित्र हृदयांत तुमच्या राष्ट्राची शक्ती धमधमत आहे. जुन्या चित्रकाराने शक्तीचें-काली देवीचें जें चित्र रंगविलेले आहे, त्यांतील तपशिलाच्या चिन्हांचा वास्तविक अर्थ कोणालाच समजत नाही. प्राचीन चित्रकार आपल्या गूढ भावनांना चिन्हांच्याद्वारे व्यक्त करीत असत. कालीचे चित्र कसे आहे? एक नग्न उग्र स्त्री. हातांत नागवी तलवार. गर्द निळा रंग. गळ्यांत माणसांच्या मुंडक्यांच्या माळा. बेफाम थैमान घालीत आहे. ही तुमच्या कालीदेवीची मूर्ती. तिच्या पायाशी तुडवून लाथाडून पडला आहे तो कोण? हें चिन्ह काय दर्शविते? कालीदेवीने लाथाडून लोळविलेला तो भिक्षुकशाहीचा दांभिक व लुच्चा भट आहे. सत्याची नागवी तलवार परजीत, आपल्या वाजवी हक्कांसाठी, कालीदेवीला या भटाला चिरडून जमीनदोस्त करणेच प्राप्त आहे. विचार करा. सावध व्हा. नाहीतर, आज तुमच्या गुलामगिरीखाली दाबून गेलेली स्त्रीजात--हिंदुस्थानची शक्ती-कालीदेवी संतापानें भडकून जाऊन, भरतभूमीवरून या दांभिक लबाड भिक्षुकशाहीचे तळपट उडविण्यासाठी खरोखरच नागवी तलवार प्रत्यक्ष परजीत, भयंकर थैमान घालायला सोडणार नाहीं. असा दिवस उगवूं देणें वा न देंणें तुमच्या हाती आहे."
"स्त्रिया माणसें आहेत, त्यांना कांही हक्क आहेत. याची जाणीव करून घ्या. लबाड भिक्षुकशाहीच्या घाणेरड्या भिकार शिकवणीच्या पचनी पडल्यामुळे, तुमचा एकजात स्त्रीवर्ग भटाभिक्षुकांचा गुलाम बनला. त्यामुळेंच तुम्हां हिंदुजनांचा सत्यानाश झाला, तुमचा मर्दानीपणा छाटला गेला आणि बरे वाईट निवडण्याची तुमची विवेकशक्ती ठार मेली. एखादी योग्य गोष्ट करण्याचा तुम्हाला उमाळा येतो; पण तुमच्या सामाजिक (जातिविषयक) बंधनांचा बागुलबोवा पाहतांच, तुमचा तो उमाळा, विद्युल्लतेच्या क्षणिक चमकीप्रमाणे, ठिकच्या ठिकाणी पार विरघळून जातो. उमाळ्याच्या या क्षणिक चमकीमुळे तरी तुम्ही किती गडद अंध:कारांत पडलेले आहांत किती नैतिक नामर्द बनला आहांत आणि तुमची आत्मिक अधोगति किती झाली आहे, हे स्पष्ट दिसून येते."
"तुमचे पौरुष पराक्रमी होण्यासाठी स्त्रियांच्या आत्मतेजाची शक्ती तुमच्या पाठिंब्याला धाऊन आली पाहिजे. स्त्रियांची शक्ती जागृत आणि तेजस्वी बनण्यासाठी त्यांचे कौमार्य बलशाही राखले पाहिजे. कुमारिकांचे कौमार्य म्हणजे प्रत्येक मानववंशाच्या उपवनांतील सुंदर सात्विक पवित्र पुष्पच होय. परंतु, अरेरे! तुमच्या हिंदुसमाजांत कामातुर धटिंगणांच्या उतावळ्या स्पर्शाने या पुष्पांना हिसडा मारून अकालीं खुडण्यांत येते, त्यांचा अपमानकारक भंग करण्यांत येतो. त्या पवित्र कौमार्य-पुष्पाचा तुम्ही हवा तसा चोळामोळा करून टाकता!"
"तुमच्या मुलींना लख्ख सूर्यप्रकाशांत वाढू द्या. त्यांच्या भोंवतीं कसल्याहि खोट्या नकली कृत्रिम किंवा दांभिक परिस्थितीचे आवरण आणि भिक्षुकशाहीच्या लुच्चा दांभिक भटांची सावलीसुद्धां पडू देऊ नका, मग पहा, त्या खऱ्याखुऱ्या मर्दांना जन्म देणाऱ्या लायकीच्या प्रभावशाली युवति बनतील. त्यांच्या शक्तीच्या प्रभावानें तुम्हाला सुद्धां त्या मर्द बनवतील. सध्या तुमच्या पोटी माणसे जन्मत नसून, होते आहे ही कृमिकीटकांची पैदास आहे. याचे कारण हेच आहे की ज्या कुमारिकांना प्रेमशून्य कामवासनेनें कोणी स्पर्शहि करता कामां नये, त्या कुमारिकांचे कौमार्य बळजबरीनें भ्रष्ट करण्यास तुमच्या भटभिक्षुक गुरूची शिकवणी आजवर उत्तेजन देत आलेली आहे."
"विवाहविधीच्या गोंडस सबबीखाली माणुसकीला लाज आणणारे असले अत्याचार करण्यापेक्षा, तुम्ही विवाहाचा पोकळ प्रतिष्ठितपणा कायमचा बंद पाडाल तर फार बरें होईल! या तुमच्या भ्रष्ट विवाह-पद्धतीने, अर्ध्याकच्च्या कमकुवत पोराबाळांची पैदास करून तुम्ही आपल्या हिंदुजातीची आत्महत्या मात्र करीत आहोत."
"या तुमच्या कर्मामुळे अखिल मानवतेपुढे तुमची जाती किती तिरस्करणीय अवस्थेंत उभी आहे, हें न दिसण्याइतके तुम्ही कितीहि आंधळे झाला असला, तरी देवाला हें सर्व दिसत आहे. हिंदु म्हणजे देवाचे असे कोण, मोठे लाडके लेक लागून गेले आहेत की, त्यांनी जननकार्याच्या त्याच्या पवित्र आणि गुप्त नियमांचा हवा तो उच्छेद करावा, हवी तशी पायमल्ली करावी, आणि त्याबद्दल निसर्गप्राप्त कोणत्याहि शिक्षेचा फटका त्यांना कधीं बसू नये?"
"तुमच्या अस्तित्त्वाला दडपीत चिरडीत नेणाऱ्या न्यायनिष्ठुर कर्मन्यायाची याद राखा. कर्मन्यायाचा कचकाच असा आहे की त्याला व्यक्तीची पर्वा नाहीं की जातीची किंमत नाहीं. आडवा आला की काप, एवढेच त्याला माहीत, या पुराणप्राचीन जगतांत आजपर्यंत शंकडों मानववंश नामशेष झाले. सफाई अस्तित्त्वांतून उठले. कालीदेवीच्या गळ्यांत जी नररूंडमाळा घातलेली आहे, ती विचारपूर्वक पहा. प्रत्येक मुंडके म्हणजे पृथ्वीतलावरून कर्मन्यायानें नष्ट झालेल्या एकेका मानववंशाची निशाणी आहे. कालीदेवीचें हें अर्थपूर्ण चित्र काढणाऱ्या प्राचीन चित्रकाराला निसर्गन्यायाची बरीच माहिती होती, असें नाहीं का तुम्हाला वाटत? पण तुमच्या भिक्षुकशाही गुरुवर्यांना?"
"कर्मन्यायाचा असा कडक शिस्तीचा दण्डक आहे की हिंदुस्थानांत न्याय समता आणि योग्य तत्त्वे यांचा अंमल सुरू होऊन, त्याबरहुकूम प्रगतिचक्राची गति पुढें गेलीच पाहिजे. या चक्राला विरोध करणाऱ्यांच्या अर्थात् चिधड्याच उडणार! ज्या धार्मिक-सामाजिक पातकांनी लोखंडी शृंखळांपेक्षाहि तुमचे हात पाय अधिक बळकट जखडून आवळून टाकले आहेत, त्या पातकांना जितक्या लवकर नष्ट कराल, तितक्या लवकर तुमची प्रगती होईल."
"जे अधिक बलवान व पुढारलेले असतील त्यांनी खाली पडलेल्या लाथाडलेल्या हतबलांना हात देऊन वर घेतले पाहिजे. ज्या घाणेरड्या धार्मिक सामाजिक नियमांमुळे वर चढलेले वरवरच तरंगत आहेत आणि खालीं पडलेले खोलखोल बुडत आहेत, त्या सर्व नियमांचा चेंदामेंदा केला पाहिजे. याचा परिणाम कांहींहि होवो, त्यापायी वाटेल तें नुकसान होवो, व्यक्तींना दुःख भोगावे लागो वा समाजाला लागो, असल्या अन्यायी नियमांची राखरांगोळी केलीच पाहिजे."
"कोणा एखाद्या विवक्षित राष्ट्राकरितां अगर जातीकरिता नव्हें तर अखिल मानवतेचा उद्धार करणारे एक साधन म्हणून, निसर्गाच्या मुशींत हिंदुस्थानची पुनर्घटना होत आहे. राष्ट्रीयत्वाच्या संकुचित कल्पनेचा यापुढें अंत होऊन, अखिल मानवतेच्या हितवादाची महत्वाकांक्षा बळावून ती विजयी झाली पाहिजे. आम्ही सर्व हिंदुस्थानवासी जन भाऊभाऊ आहोंत, या उच्च मनोवृत्तीच्या भावनेची प्रभात होण्यापूर्वी कल्पनातीत क्लेशांच्या दिव्यांतून गेले पाहिजे, वर्णभेद जातिभेद मतभेद कांहीहि असले, तरी आम्ही सर्व हिंदवासी भाऊभाऊ आहोंत, या भावनेच्या आणि माणुसकीच्या प्रकाशानें आपापली घरें प्रकाशित करा."
|| वंदे मातरम् ||
****