हिंदू धर्माचे दिव्य
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
(नवीन पानावर)
दुसऱ्या आवृत्तीविषयी
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
हिन्दु तितुका मेळवावा । आपुला हिन्दुधर्म वाढवावा ।।
सर्वत्र विजयी करावा । सनातन हिन्दुधर्म ।।
हिंदु धर्माचें दिव्य.
आणि
संस्कृतीचा संग्राम
`Without the missionary spirit there can be no continued vitality and growth of any Religion’
- Monier Williams
(आवृत्ती २री)
लेखक
केशव सीताराम ठाकरे
संपादक, प्रबोधन
प्रकाशक,
पुरुषोत्तम महादेव जुवळे
नरेंद्र पुस्तकालय, दादर-मुंबई.
किंमत फक्त एक रुपया
प्रकाशक
रा. रा. पुरुषोत्तम महादेव जुवळे
नरेंद्र पुस्तकालय, दादर-मुंबई
मुद्रक
रा. रा. लक्ष्मण भाऊराव कोकाटे
यानी पुणे पेठ सदाशिव घ. नं. ३०० येथे आपल्या `हनुमान’ छापखान्यात छापले.
All rights reserved by the Author
अर्पणपत्रिका
आद्य हिन्दुमिशनरी
प. वा. गजानन भास्कर वैद्य
यांच्या दिव्यात्म्यास
अर्पण
असो
के. सी. ठाकरे
प्रकाशकांची विज्ञप्ति
श्री. ठाकरे यांचे हें बहुमोल पुस्तक जनीजनार्दनाच्या सेवेला सादर करण्याचा सुमसंग, अत्यंत दीर्घ कालानेंच कां होईना, लाभत आहे, याबद्दल आम्हांला आनंद वाटतो.
वास्तविक, हें पुस्तक डिसेंबर १९२२ मध्येंच प्रसिद्ध व्हावयाचें; परंतु मुद्रणालयाच्या अपरिहार्य अडणीमुळें व लेखकांचें कार्यबाहुल्यांमुळें आम्हांला आमचें आश्वासन पुरें करतां आलें नाहीं. तथापि, जनतारूपी जनार्दन या सकारण कालावधीकडे सहानुभूतीनेंच पाहील, अशी आम्हाला उमेद आहे.
त्याचप्रमाणे, सध्यांच्या धामधुमीच्या काळांत विचारजागृति करून पुढील काळाकडे समतोल पाहण्याची दृष्टि देणा-या असल्या उत्कृष्ट ग्रंथाचा तो प्रेमाने आदर करील अशीहि आम्हाला आशा आहे.
श्री. ठाकरे यांची प्रकृति अलिकडे कित्येक महिने बरी नसते. शिवाय त्यांची कार्यव्याप्तीहि अधिक, अशा स्थितींतहि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन हें पुस्तक अत्यंत परिश्रमपूर्वक लिहून दिलें; व त्यामुळे आम्हाला जनसेवेची संधि मिळाली. श्री. ठाकरे यांचे आम्ही याबद्दल अत्यंत ऋणी आहों.
पुरुषोत्तम महादेव जुवळे
प्रकाशक
प्रस्तावना
ग्रंथ आणि ग्रंथकार यांची ओळख
ग्रंथ आणि ग्रंथकार यांची ओळख करून देण्याकरितां चार शब्द लिहिण्याच्या विचारानें लेखणी हातात घेतली; परन्तु ग्रंथाची ओळख करून द्यावयाची म्हणजे इतकेंच म्हणावयाचें की, हा ग्रंथ वाचकांनीं मनोभावानें वाचावा. तो मला जसा मनोवेधक वाटला तसा तो वाचकांनाही वाटेल. ग्रंथकाराची ओळख करून द्यावयाची म्हणजे ते अभयानें लिहिणारे व बोलणारे सत्त्वशील इतिहासभक्त आहेत, इतकेंच सांगून त्यांचा अन्तरात्मा ग्रंथांतच पहावा, असे म्हणावयाचे. ग्रंथ वाचीत असतां वाचकांना असें आढळेल कीं, अनेक भावनामय असा कोणी जीव आपल्याशीं बोलत आहे. तोच खरा तेजस्वी ग्रंथकार, ग्रंथकाराचे नाव किंवा ग्रंथकाराचे छायाचित्र हें ग्रंथकाराचें खरें स्वरूप नव्हे.
रा. केशवराव ठाकरे ह्यांची तपश्चर्या मोठी दिसते. त्यांच्या भाषेसारखी जिवन्त भाषा वाचण्याचे प्रसंग थोडेच येतात. प्रस्तुतचा ओजस्वी लेख वाचून माझ्याप्रमाणेच वाचकांसही वाटेल. मुलांनी व मुलींनी वाचावयाचे इतिहासग्रंथ जर अशा भाषेत लिहिले जातील तर इतिहासविषयाचें शिक्षण मनोरम व परिणामकारक होईल!
हिन्दुधर्माला इतिहास आहे हें फार थोड्यांच्याच लक्षांत येतें. पुराणमतवाद असा आहे की, आम्ही अनादि कालापासून आहों तसेच आहों. प्रस्तुतचा लेख वाचीत असतां वाचकांना नवी दृष्टी येईल व ते नव्या दृष्टीने हिन्दुधर्माकडे पहावयास सिद्ध होतील. ग्रंथ, सिद्धान्त, आणि लोकसंग्रह असे तीन ओघ हिन्दुधर्माच्या इतिहासात आहे. ग्रंथ अनेक, ते एकाच दिवशीं प्रगट झाले नाहींत; सिद्धान्त हे एकाचीं अनेक रूपें, पण तीं प्रगट झालीं भिन्न भिन्न काळीं. हिन्दुलोक हे अनेक शतकांच्या हे अनेक शतकांच्या संग्रहाने झाले आहेत हे तीनही ओघ अनेक शतकें वहात आले आहेत.
पण तिस-या ओघाला उच्चनीचता इतिहासांत फार आलेली दिसते. हिंदुजन ग्रंथांना जपतात; ते कांहींसे सिद्धांन्ताना जपतात. पण ते लोक संग्रहाचा विचार करीत नाहींत. लोकसंग्रहाच्या बाजूचा ओघ जर सुकून वाळून गेला तर दुसरे दोन असून नसून सारखेच. हा जो नवा मिशनरी भाव शिकावयाचा आहे त्याचे चार चांगले धडे केशवरावजींचा हा ग्रंथ शिकवील.
`अनेक प्राणघातक दिव्यातून आज हिंदुधर्म पार पडलेला आहे’ (पृष्ठ ६) आताचा प्रसंग कठीण आहे. हा ग्रंथ वाचून हिंदुजनांच्या चित्ताला काहीसा सावधपणा येईल, असा मला भरवसा आहे. हिंदुस्थानातील मुसलमान म्हणविणा-या आमच्या देशबांधवांच्या संस्कृतीचा आत्मा आर्य आहे (पृष्ठे १८-१९) तसा आज असंख्य कुस्तीजनांच्या संस्कृतीचा आत्माही आर्य आहे. आम्ही हिंदुजनांनी दोघांनाही `या’ म्हणावे अशी भावना या ग्रंथाच्या वाचनाने जागृत होईल. समर्थांचे–
पतित करावे पावन ।
हे वचन वाचून हिंदुजन लोकसंग्रहाचा विचार करू लागले तर त्याचे पुण्य केशवरावजींना लागेल. हिंदुधर्माची दशा अशी कां, तो सोने असून मातीसारखा कां झाला आहे. याचे उत्तर इतिहास देईल (पृष्ठ ३०) हा भाग वाचीत असतां माझ्याप्रमाणेच वाचकांना थोडे थांबून विचार करावासा वाटेल. किती हिंदु मुसलमान होऊन मोठे राज्यकर्ते झाले तो इतिहास पृष्ठ ५० यावर वाचून लोकसंग्रहाच्या बाजूने विचार करण्याची बुद्धी हिंदुजनांना होईल व केशवरावजींची लेखणी यशस्वी होईल.
प्रस्तुत ग्रंथाची भाषा जशी ओजस्वी तशी ती कलात्मक व भावोद्दीपक आहे, हे वाचकांनी पृष्ठे ६० ते ६५ वाचून स्वतःच्याच अनुभवाने पहावे.
शिवबा !
जी.
शिवबा, यात तू इतका गोंधळून का गेलास?
आई काय करू?
निंबाळकरांना प्रायश्चित्त देऊन हिंदु करून घे.
असे विचार अनेक आयांनीं, अनेक मातांनी, अनेक जिजाबाईंनी बोलून दाखवावे, व अनेक निंबाळकरांना पावन करून हिंदुधर्मात घ्यावे, असे त्यांनी आपल्या पुत्रांना सांगावे. इतकी विचार क्रांति प्रस्तुतच्या लेखासारखे लेख घडवून आणतील. हे पुण्यकार्य करण्यास रा. केशवराव ठाकरे पुष्कळ वर्षे जगोत श्रीकृष्णांचा आशीर्वाद असो. हा ग्रंथ वाचून लोकजागृति होवो.
गजानन भास्कर वैद्य
मुंबई,
ऑक्टोबर २०, १९१९
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
हिंदु धर्माचें दिव्य
नवीन मन्वंतराचा उदय झाला आहे. जगांतील सर्व राष्ट्रांप्रमाणेच आमच्या प्याऱ्या भरतखंडात नवजीवनाचें राष्ट्रीय तेज आसेतु हिमाचल नवीन पिढीच्या अंत:करणांत उसळ्या मांरू लागलें आहे. गेली दोन हजार वर्षे मेंढराप्रमाणे एकमार्गी संकुचित पुराणप्रियतेच्याच अभिमानांत गर्क असलेली हिंदी जनता इंग्रजी विद्या-वाघिणीचे दूध पिऊन पिऊन आज केवळ वाघाचीच डुरकणी नव्हे, तर हिंदुस्थानच्या भवितव्यतेच्या आकाशांत दणदणाट उडविणाऱ्या प्रतिरोधाच्या मेघांच्या गर्जनांना आपल्या
सिंहवत गर्जनांची उलट सलामी
देण्यास तयार झाली आहे. नवजीवनाच्या बॉयलरमध्ये प्राचीन संस्कृतीच्या धगधगीत आंचेनें कढून कढून तयार झालेली अभिनव महत्त्वाकांक्षेची वाफ, पूर्वीचे स्वार्थी व संकुचित मनोवृत्तीचे आत्मघातकी सांखळदंड खडाखड तोडून, त्रिकोनी हिन्दी द्वीपकल्पाच्याच नव्हे, तर अखिल मानवजातीच्या सुखवर्धनार्थ आज चैतन्याच्या एंजिनांत प्रविष्ट झाली आहे. प्रांतिक ऐक्याच्या कल्पनांचा भोंवरा वाढत वाढत आज साऱ्या भरतखंडाला वेढूं पहात आहे आणि या चैतन्याचें एंजीन मुत्सद्देगिरीच्या धोरणी रूळांवरून असेंच पुढेपुढें दामटीत नेल्यास, ही भारतीय ऐक्याची विद्युल्लता सर्व भूगोलालाही आपल्या बाहुपाशांत घट्ट कवळून,
विश्वात्मैक भावाचा आर्य प्रसाद
साऱ्या जगाच्या तोंडांत कोंबून, आमच्या हिंदुस्थानांतील प्राचीनतम आर्यसंस्कृतीच्या सनातन मुरंब्याची लज्जत त्याला लावल्याशिवाय खास राहणार नाही. नवजीवनाची शक्ती फार अचाट. हिमनगासारखे गगनचुंबीत पर्वताधिपति तिच्या प्रवाहाला प्रतिरोध करू शकणार नाहीत. अटलांटिक पॅसिफिकसारखे महोदधि नवजीवनाच्या चैतन्याला भिजवू शकणार नाहींत. तुफानी वावटळाचे वारे या दिव्य चैतन्याचा शेंडा बुडखासुद्धां कंपित करू शकणार नाहीत. त्रैलोक्याचाही निमिषार्धात चक्काचूर करणाऱ्या आकाशगामी मेघकन्या आपला ज्वलज्जहाल नेत्र या चैतन्याकडे फिरवू शकणार नाहीत. हे नवजीवनाचे चैतन्य म्हणजे
पारमेश्वरी अगम्य लीलेचा अवतार
आहे. हे चैतन्य पारमेश्वरी शक्तीनें रसरलेले आहे. नराचे नारायण याच हंगामांत उदयास येणार.याच पर्वणीत मुक्याला वाचा फुटून पांगळेही पर्वतांना ठेंगणे करणार. पूर्व पश्चिमेकडे तोंड फिरवून बसलेल्या लक्ष्मी सरस्वती या सवती सवती एकमेकींच्या हातांत हात घालायला याच अमृतसिद्धि योगाची संधी पकडणार. कवींच्या प्रेमळ काव्य-ललकारीच्या आव्हानाला मान देऊन, हिंदुस्थानची व हिंदुधर्माची रात्रंदिवस काळजी वहाणारे अगम्यस्थलनिवासी संत याच वेळी उघडपणे प्रगट होऊन, आपल्या लाडक्या देशाचा व सनातन धर्माचा शीणभाग उतरण्याची खटपट करतील. या महात्म्या संतांच्या निःसीम निष्काम कर्मयोगाच्या तपश्चर्येवरच आम्हां दीन दुबळ्या मानवांचा सामाजिक आणि राष्ट्रीय संसार चालावयाचा असतो. आमच्या ऐहिक व पारलौकिक उन्नतीच्या नौकेचें सुकाणूं जरी आमच्या हाती असले, तरी ती नौका अज्ञानपंकांत रूतूं न देण्यासाठी हे दिव्य महात्मे आपल्या तपश्चर्येची सर्व फळे आम्हां मानवांच्या कल्याणासाठी आज युगानुयुगे समर्पण करीत आले आहेत. असा आम्हां
वेदानुयायी हिंदूंचा विश्वास
आहे. आज भरतखंडांत जी जागृति झाली आहे; आत्मोद्धाराचा आणि आत्मोद्धाराबरोबरच जगदुद्धाराचा जो प्रश्न आज रात्रंदिवस हिंदी जनतेच्या अन्तःकरण-कपाटावर सारख्या धक्क्या देत आहे. आमची वाट चुकली आहे, आम्ही आत्मस्वरूपाला पारखे झालों आहोत.
दिसतें हें स्वरूप, भासते ही संस्कृति आणि करतों हें कर्म आमच्या पूर्वपरंपरेला अनुसरून नाहीं, अशी जी जागृति आज साऱ्या भरतखंडांत उत्पन्न झाली आहे, तिच्या पाठीशीं या संतांचीच इच्छाशक्ति आहे, हे विसरता कामा नये. अर्थात् सामाजिक आणि राष्ट्रीय चळवळीच्या जोडीनेंच
हिंदु धर्म आणि सुधारणा
हा प्रश्न तितक्याच नेटानें आमच्या विचारक्षेत्रांत संचार करू लागावा, यात आश्चर्य ते कसलें? सध्यां विचार सुरू झाले आहेत. आणि आचारालाहि थोडा प्रारंभ झाला आहे. निरनिराळे विद्वान् धर्मसुधारणा कशी करावी किंवा करतां येणें शक्य आहे, याबद्दलचे आपापले प्रामाणिक विचार बोलून दाखवूं लागले आहेत. हिंदु धर्माचें प्राचीन व्यापक व उदात्त रूप पार बदलून जाऊन त्याला सांप्रतचें अति संकुचित, क्षुद्र आणि हीनदीन स्वरूप कां प्राप्त झाले, याचीं प्रमेये सोडविण्यांत कोणी गुंग झाले आहेत. हिंदु धर्मानें आपली प्रचलित प्रतिगामी वृत्ति साफ झुगारून देऊन, चालू मन्वंतराच्या ओघाशी केवळ अनुगामीच नव्हे, पण समगामी कसें बनावें याचाहि मंत्र सांगत आज कित्येक महात्मे आपल्या कानार्थी लागत आहेत.
हिंदु मिशनरी सोसायटी
सारखी संस्था अत्यंत व्यापक धोरणावर धर्माचें शुद्ध स्वरूप जनतेपुढे मांडून `देवा जगीं वाढवि हिंदु धर्म` अशी उच्च महत्त्वाकांक्षेची तुतारी फुंकीत पुढे सरसावली आहे या संस्थेचा प्रारंभ नदीच्या उगमाप्रमाणे अगदी लहान आणि क्षुल्लक दिसत असला, तरी तिचें बीज फार सकस आहे; इतकेंच नव्हे तर जे हिंदुधर्माचे धोरणी प्रतिस्पर्धी आहेत, त्यांच्या डांवपेचांवर या संस्थेने उघड उघड स्वारी करण्याचें आपलें धोरण न डगमगता जाहीर केलें आहे, त्यांनी मात्र या संस्थेच्या भावी कार्यव्याप्तृत्वाचा आडाखा आगाऊच आजमावून ठेवून, त्याप्रमाणें
डिफेन्सिवची तयारी
आतांपासूनच मोठ्या काळजीने चालविली आहे. हिंदु मिशनरी सोसायटी हा काळाच्या उदरांतून बाहेर पडलेला एक अद्भुत चमत्कार आहे. नवचैतन्याची ही एक धगधगीत ठिणगी आहे. हिंदुधर्माचा कासावीस झालेला प्राण वाचवून त्याचे पुनरूज्जीवन करणारी अमृतसंजीवनी आहे. हिचा प्रताप आज कळणार नाहीं. शिवाजी महाराजांच्या प्राथमिक प्रयत्नपरंपरेला नाक डोळे मुरडून त्यांचा धिक्कार करणाऱ्या बड्याबड्या मराठे सरदारांप्रमाणे आज आमचे नामधारी आचार्य व शास्त्रीपुरोहित या अल्पवयी कोमल बालिकेकडे पाहुन खुशाल हांसोत किंवा तिची मनमुराद निंदा करोत, सरतेशेवटीं शिवप्रभावापुढें जसें त्याच्या गर्विष्ठ प्रतिस्पर्ध्यांशी बिनशर्त माना वांकविल्या, त्याचप्रमाणे या हिंदु मिशनरी सोसायटीला हेच आचार्य आणि हेच शास्त्री पंडित
चिरायु भव
असा आशीर्वाद सग्ददीत अंतःकरणानें दिल्याशिवाय खास रहाणार नाहींत. हिंदु मिशनरी सोसायटी ज्या कालोदरांतून यदृच्छेनें बाहेर पडली, त्याच काळाच्या उदरांत तिचा भावी पराक्रम साठविलेला आहे. या सोसायटीचा पराक्रम वर्तमान काळाच्या इतिहासांत सांपडायचा नाहीं, तो भविष्य काळाच्या इतिहासांत रेडियमच्या अक्षरांनीं लिहून ठेवलेला आहे. शेंकडों मैल लांबवर पसरणाऱ्या आपल्या विशाल भुजगणांनीं रत्नाकरास भेटण्यासाठी फोफावत जाणाऱ्या प्रचंड सिंधु गंगा महानदांच्या उगमाजवळील सूक्ष्म झिरपणाऱ्या झऱ्याप्रमाणे सध्या या उदयोन्मुख संस्थेची स्थिति आहे. संस्थेचें सांप्रतचें स्वरूप व अवसान तिच्या कार्याच्या आणि ध्येयाच्या मानाने कितीहि अल्पमत भासले किंवा खरोखरीच असले तरी तिनें जें आपल्या
ध्येयाचें निशाण उंच फडकविलें
आहे. त्या तिच्या उदात्त हेतूंनींच तिच्या स्मारकाचा पाया कायमचा बसविला आहे, ही गोष्ट नाकबूल करून चालायचे नाही. हिंदु मिशनरी सोसायटीच्या कर्तबगारीचा प्रश्न तिच्यांतल्या कार्यकर्त्या मंडळीवरून न सोडवितां, तिच्या ध्येयांच्या उच्चतम भरारीवरूनच सोडविण्याचा कोणी प्रयत्न केल्यास, या संस्थेचा भरतखंडाच्या कार्यभूमिकेवर जो अवचित अवतार झाला आहे, त्यांत हिंदुधर्माच्या भवितव्यतेचीं बरींचशी कठीण कठीण गणितें अगदी सुलभ व सोप्या रीतीनें सोडविण्याची गुरुकिल्ली खास सापडेल.
आजला हिंदुधर्म कोणा स्थितीत आहे? क्रिस्ती धर्माचा उदय होण्यापूर्वी किमानपक्ष चार हजार वर्षावर ऋग्वेदादि चतुर्वेद आणि सांप्रतच्या मनुंतहि मोठमोठ्या पट्टीच्या तत्त्ववेत्त्यांच्या अकला गुंग करणारी आमची ती दिव्य उपनिषदें निर्माण करणारा
आमचा हिंदुधर्म जिवंत आहे काय?
मेल्या माणसाला जिवंत आणि नपुंसकाला मर्द बनविणारा भगवग्दगितेचा कोहीनूर ज्याच्या मस्तकावर अविछिन्न सनातन वैभवतेजाचा अभिषेक अझूनहि करीत आहे. त्या आमच्या हिंदुधर्माला जगांत कांहीं मान आहे काय? `मी हिंदु आहें` असे मोठ्या हर्षानें आणि अभिमानाने सांगण्यांत वाटणारी एकप्रकारची धन्यता तरी आज हिंदु म्हणविणाऱ्यांत राहिली आहे काय? साऱ्या जगतीतलावर सांप्रत रूढ असलेल्या अनेक धर्मात प्रमाणभूत असलेला `एकमेवाद्वितीयम्`चा दिव्य मंत्र अत्यंत प्राचीन काळीं ज्या उदार हिंदुधर्मानें त्यांना घ्या घ्या म्हणून आग्रह करून शिकविला; अध्यात्म विद्येच्या गूढ तत्त्वांचा सोपपत्तिक उलगड्यांचे भांडार उघडें ठेवून जगांतील सर्व मानवजातीला ज्यानें सर्वात्मैक्य भावाचा पहिला `श्रीगणेशा` शिकविला; आणि ज्याच्या मुक्त ज्ञानभांडारांतील रत्ने सर्व भूगोलावर उधळलीं असतां, त्यांतल्या एकेका रत्नाच्या भांडवलावरच एकेक नवीन धर्म ठिकठिकाणीं निर्माण झाला, त्या हिंदुधर्माची आजच्या मन्वंतरांत कांहीं मान्यता आहे काय? याचे उत्तर हेंच कीं
नाहीं, नाहीं, मुळींच नाहीं!!
हरहर! आज हिंदुस्थानांत कोट्यवधि हिंदु असून, त्यांना हे शब्द बोलवतात आणि लिहवतात तरी कसे? हिंदुधर्माला आज वाटेल त्या झोटिंगानें वाटेल तशा शिव्या द्याव्या, त्याची वाटेल तशी व्याख्या करून त्याची नालस्ती करावी, आणि त्यांतील उदात्त तत्त्वांना वाटेल तसा बाष्कळ पेहराव चढवून त्यांची भर चव्हाट्यावर हेळणा करावी, ही परिस्थिती निमूटपणे सहन करणारे हिंदु प्राचीन आर्यांचे वंशजच असावे काय? ज्या हिंदुधर्माच्या सर्वव्यापी उदरांतून जगांतील प्राचीन अर्वाचीन राष्ट्रांना निरनिराळ्या धर्ममतांचा पुरवठा झाला. त्याच्याच अवशिष्ट अनुयायांना आज
हिंदुधर्म मरो, क्रिस्ती धर्म तरो
ही कृतघ्न शापवाणी ऐकत स्वस्थ बसण्याची पाळी यावी काय? हिंदु बांधवहो, प्रसंग येऊ नये. आला. आता तरी डोळे नीट उघडा, आणि प्राचीन आर्यांचे रक्त जर खरोखर तुमच्या धमन्यांतून अजिबात नष्ट झाले नसेल, तर हिंदुधर्माच्या नरड्याला लागलेल्या कुकल्पनांच्या आणि संकुचित वृत्तीच्या ताती तडातड तोडून त्याला प्रथम मुक्त करा. त्याचे पूर्वीचे स्वातंत्र्य त्याला द्या, म्हणजे मग हिंदुधर्माचे साम्राज्य साऱ्या जगावर पुनश्च कसें भरारते ते पहा, अनेक प्राणघातक दिव्यांतून आज हिंदुधर्म पार पडलेला आहे. हिंदुधर्माचे टोलेजंग बुरूज आज जरी प्रतिस्पर्ध्यांच्या तोफांच्या माऱ्यानें जमीनदोस्त झालेले असले, तरी त्याचा सनातन पाया आजलाहि अभंग राहिलेला आहे, ही गोष्ट विसरू नका. याच पायावर सनातन हिंदुधर्माची पुनर्घटना करून त्याचे वैभव वृद्धिंगत करण्याचा यत्न आपण केला पाहिजे. ज्या हिंदुधर्माने अगदी सढळ हाताने साऱ्या जगाला आग्रह करकरून उत्तमोत्तम तत्त्वज्ञानाच्या मेजवान्यांवर मेजवान्या दिल्या, त्यालाच आज सात्त्विक पोषणाची मोताद पाडावी, त्याला
कन्झम्पशन आणि हार्टडिसीझ
लागावा, त्यानें कायमचा राम म्हणावा म्हणून आगाऊच तिरडी मडक्याची व्यवस्था करून त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी वाट पहावी, ही काळीज चरचर चिरणारी स्थिती अंतःपर कधीहि सहन न होणारी अशी नव्हे काय? याला उपाय काय?हिंदु म्हणविणाऱ्या प्रत्येक लहान थोर व्यक्तीने या कामी कशी मेहनत घेतली पाहिजे? याची पद्धति ऐतिहासिक पुराव्यांनींच शोधून काढली पाहिजे. हिंदुधर्माचा ऱ्हास का झाला आणि तो कसा सुधारता येईल याची खरीखुरी विश्वसनीय माहिती इतिहास सांगेल. वर्तमानकाळाच्या बऱ्या वाईट परिस्थितीचे धागेदोरे भूतकाळांत सांपडतांत आणि त्यांच्याच अनुरोधानें भावी काळ स्वर्गतुल्य किंवा नरकप्राय करण्याची कर्तबगारी आपल्या मनगटांत सांठविलेली आहे.
हिंदुधर्माला क्लैब्य कां आलें आणि हिंदुंच्या जगविख्यात संस्कृतीला इतर संस्कृतीच्या पुढे मान कां वांकवावी लागली, याचें उत्तर भूतकाळचा इतिहास स्पष्ट देईल. हिंदुधर्मावर आजपर्यंत जीं जीं गंडातरें आली आणि ज्यांच्या दिव्यांतून त्याला `येन केन प्रकारेण’ निसटून जेमतेम जीव बचवावा लागला, त्यांत
इस्लाम धर्माची मोहीम
ही मुख्य होय. अर्थात् या मोहिमेच्या दिव्यांतून पार पडतांना हिंदुधर्मप्रचारकांची आणि खुद्द हिंदुधर्माची स्थिति कशी होती, याचा ऐतिहासिक दृष्ट्या आपण नीट छेडा लावल्याशिवाय हिंदुधर्माच्या भावी पराक्रमाचा नकाशा रेखाटता येणार नाही. अर्थात् ऐतिहासिक संशोधनासाठी अवश्य लागणारी निस्पृहता आणि निर्भेळ सत्यनिर्णयार्थ लागणारी मनोवृत्तीची समता आणि निःपक्षपणा या गोष्टींचा बिनमुर्वत ब्रेक आमच्या विचारसरणीस लाऊन आम्ही आता अधिक पाल्हाळ न लावतां
पुण्यश्लोक महंमद पैगंबर
आणि त्यानें स्थापन केलेला इस्लाम धर्म यांच्या इतिहासांचे त्रोटक परंतु सूक्ष्म विवेचन करण्याकडे वळतो. साधारणतः पाहिले तर सुमारे ९०० वर्षांपूर्वी सिंधुनदीच्या अलीकडे एकहि मुसलमान नव्हता. खरे मुसलमान म्हटले म्हणजे आरब. ते हिंदुस्थानांस फारसे आलेच नाहींत. हिंदुस्थानांत सध्या मुसलमान म्हणविणारे लोक अजमासें पांच कोटी आहेत. इराण व तुर्कस्थान या इस्लामी राष्ट्रांतील मुसलमानांची लोकसंख्या फक्त अडीच कोटी आहे. म्हणजे सम्राट पंचम जार्ज बादशहा यांच्या हिंदी साम्राज्यांत इस्लामी साम्राज्यापेक्षा मुसलमानांची वस्ती दुप्पट आहे. ही गोष्ट विशेष लक्षांत ठेवण्यासारखी आहे. हें असें का? हिंदुस्थानांतच मुसलमानांची इतकी जास्त वस्ती कां? खरें पाहिले तर प्रथम इकडे फार मुसलमान आलेच नाहीत; बरें जे कांही आले त्यांनी बरोबर बायकाहि आणिल्या नव्हत्या. परंतु राज्यलोभानें आणि धर्मप्रसाराच्या महत्त्वाकांक्षेनें त्यांनी हिंदुस्थानांत आपला संसार थाटतांच
हिंदु स्त्रियांशी लग्ने लावलीं
आणि त्यांच्या वंशाचा येथे वेलविस्तार वाढला. शिवाय इस्लाम धर्माचा चांदतारा तलवारीच्या जोरावर हिंदुस्थान आक्रमण करू लागतांच, बळजबरीनें किंवा आपखुषीनें बाटून मुसलमान झालेल्या लाखों हिंदुंची त्यांतच भर पडली आणि अशा रीतीनें हिंदुंच्या हिंदुस्थानांत मुसल्मानांची लोकसंख्या भराभर वाढत गेली. यावरून हे अगदी स्पष्ट होत आहे कीं, आजचे हिंदुस्थांनांतील मुसल्मान म्हणविणारे आमचे देशबांधव हे पूर्वाश्रमीचे आमचे हिंदुबंधूच होत. साष्टी प्रांतांतल्या क्रिस्ती बांधवांप्रमाणेच हे आमचे सारे
हिंदी मुसल्मान पूर्वीचे अस्सल हिंदुच
असल्यामुळें हिंदुस्तान आपला मायदेश आहे, हा अभिमान बाळगिण्याचा त्यांना हिंदुंइतकाच अधिकार आहे, हें अधिक विशद करून सांगणे नको. इस्लाम धर्माचा मुख्य उत्पादक महंमद पैंगबर याचा अवतार, त्याची धोरणी कर्तबगारी आणि अल्पावकाशांत त्याच्या धर्मानुयायांची झालेली भरभराट इत्यादि गोष्टी इतक्या चमत्कारपूर्ण आहेत कीं मानवी अंतःकरणाला आश्चर्यानें थक्क करून सोडणारी यासारखी दुसरी हकीगत जगाच्या उपलब्ध इतिहासांत दुसरी मिळणे शक्य नाहीं. एकट्या महंमदाच्या कर्तबगारीशिवाय बाहेरची कोणत्याहि प्रकारची चेतना किंवा कसलीहि मदत नसतांना, केवळ ८० वर्षाच्या अवधींत सिंधुनदीपासून पोर्तुगालपर्यंत आणि अरबी समुद्रापासून व्होल्गानदीपर्यंत एका अरबी दरिद्री कुटुंबांतील मनुष्यानें आपल्या नवीन धर्ममताचा प्रसार एकजात करण्यास समर्थ व्हावें, हा `न भूतो न भविष्यति` असा चमत्कार कोणाच्या अंतकरणांत कौतुकाच्या ऊर्मी उठविणार नाहीं?
स्वधर्माभिमानाच्या आवेशांत महंमदानुयायी खुशाल वाटेल तर म्हणोत कीं इस्लाम धर्माच्या या तीव्रतम प्रसाराच्या मुळाशीं महंमदानें आत्मचिंतनांतून निर्माण केलेल्या ‘एको देव:` या मुख्य तत्त्वाची प्रेरणा होती; परंतु धार्मिक भावनेच्या क्षेत्राबाहेर किंचित येऊन ऐतिहासिक आधाराच्या दुर्बिणींतून पाहू लागतांच हा निर्णय मूलतः चूक आहे, असेंच दृष्टीस पडेल. `देव एक आहे` ("The creed of the man who is said to possess the true Veda is singularly simple. He believes in the unity of all beings. In other words, that there is but one real Being in the universe, which Being also consititutes the universe... This one Being is thought of as the Great Universal Spirit." Indian Wisdom – p.36) या सनातन तत्त्वाचा कर्णा खिस्ती शकाच्या पूर्वी कमीतकमी आठ हजार वर्षे सनातन वैदिक धर्मानेच फुंकलेला आहे.
सदेव सोम्येदमग्र आसीदेकमेवाद्वितीयम्|
तद्वैक आहुरसंदेवमग्र आसीदेकमेवाद्वितीयम्
तम्मात्सतः सज्जायत ।। १ ।। छान्दोग्योपनिषद् अ. ६ . २.
`एकमेवाद्वितीयम्` चे सनातन तत्त्व प्रथम ज्या उपनिषदांनीं प्रगट केलें त्यांचा काळ पाहिला (क्रि.श. पू. ५०० वर्षे) कीं यहुदी इस्लाम ख्रिस्ती इत्यादि धर्माच्या प्रचारकांनी अगदीं अलीकडे त्याची मोठ्या चाणाक्षपणानें नक्कल करून आपापल्या धर्ममतांच्या द्वारे त्याची महती वाढविण्याचाच स्तुत्य उपक्रम केला असें म्हणणें प्राप्त होते. शहाजहान बादशहाचा पुत्र दाराशेखो यांनी जेव्हां उपनिषदांची पर्शियन भाषेंत भाषांतरें करविली तेव्हांहि याच मताचा त्यानें पुरस्कार केल्याचे इतिहासांत नमूद आहे. हिंदूंच्या ज्या सनातन वैदिक धर्मानें अत्यंत प्राचीन काळापासून मानवी सृष्टीच्या उच्च नीच प्रवृत्तीला पोषक अशा निरनिराळ्या
सोईस्कर तत्त्वांचा मुबलक भरणा
करून, क्रमाक्रमानें-आत्मसंस्कृतीच्या परिणतीच्या पायरीपायरीनें-अखेर निर्गुण निराकार `एको देव:` च्या सनातन सत्य तत्त्वाची खरीखुरी बिनचुक ओळख पटविण्याइतकी धोरणी उदारमनस्कता प्रगट केली. ज्या हिंदुधर्मानें `नेचर वर्शिप`-निसर्गपूजनापासून तों तहत `एकमेवाद्वितीयमा` पर्यंतच्या ईश्वरप्राप्तीच्या सर्व साधनांचा आपल्या तत्त्वपरिषदेंत बिनतोड संग्रह केला, तोच हिंदुधर्म त्यांतल्या अवघ्या एकाच तत्त्वाचा पुरस्कार करणाऱ्या एखाद्या कालच्या नवीन धर्मपंथापुढें हां हां म्हणतां चिरडून हतबल होईल, हे विधान सर्वसाधारण बुद्धीलासुद्धां कधीं पटावयाचें नाहीं. इस्लाम धर्माचा अत्यंत अल्पावकाशांत इतका जबरदस्त फैलाव होण्यास निव्वळ धर्मतत्त्वापेक्षा महंमदाची आडाखेबाज
धोरणी व्यावहारीक दृष्टी
किंवा ज्याला आपण अलीकडच्या मनूंत `डिप्लोमसी` असें म्हणतों, तीच विशेषतः कारणीभूत कशी झाली व ही डिप्लोमसी ६ व्या शतकांतील हिंदुधर्माच्या संकुचित मनोवृत्तीच्या प्रवर्तकांत अज्जीबात ऱ्हास पावलेली आढळल्यामुळेच महंमदाच्या चांदताऱ्याचा सर्वग्रासी शह हिंदुच्या स्वस्तिकाला बिनचुकमर्मी कसा लागला, हें पाहाण्यासाठीं इस्लाम धर्माच्या उत्पत्तिप्रसाराचा इतिहास आपणांस प्रथम थोडक्यांत पाहिला पाहिजे. महंमद ज्या आरबसमाजांत अवतीर्ण झाला ते आरब लोक पूर्वी कट्टे मूर्तिपूजक होते. मक्का येथील सुप्रसिद्ध काबाच्या मंदिरांतील ३६० निरनिराळ्या मूर्तीची ते भक्तिभावानें पूजा अर्चा करीत असत. आरबस्तानच्या सर्व भागांतून येथें मोठी यात्रा भरत असें. या आरबी लोकांशिवाय मूर्तिपूजकाचे अनेक दुसरे पंथ आरबस्तानांत होतेंच. कित्येक आरब तिबेटांतील लामांच्या बौद्ध धर्माचे अनुयायी होते, तर पुष्कळांनी क्रिस्ती धर्माची दीक्षा घेऊन त्याचाहि थोडाबहुत प्रसार आपल्या देशबांधवांत केलेला होता. फार काय पण ज्या एकेश्वरी मताचा पुरस्कार व प्रसार करण्याकरिता महंमदाचा अवतार झाला असें त्याचे अनुयायी मानतांत; तें एकेश्वरी मत, रोमन लोकांच्या छळांमुळे उत्तर सिरीयातून दक्षिण आरबस्तानात पळून आलेल्या यहुदी लोकांनी या आरबात बरेंच प्रचलित केलें होते.
यावरूनच इस्लामी धर्म म्हणजे यहुदी आणि क्रिस्ती धर्माची
नवीन सुधारलेली आवृत्ती
असे म्हणतात ते काही खोटे नाही. महंमद पैगंबर या लोकोत्तर महापुरुषाचें कूळ किंवा मूळ साधूंच्या आणि नदीच्या कुळामुळाप्रमाणे शोधीत बसण्यांत हाशील नाहीं. त्याची वृत्ति पहिल्यापासून चिंतनमग्न आणि शंधक असे. वयाच्या २५ व्या वर्षी सिरीया प्रांतांत त्याला येशू क्रिस्ताच्या धर्मांची काही माहिती झाली. परंतु त्यांतील
पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा
या त्रयींचा घोटाळा काहीं त्याला मानवला नाही. आणि अखेरीस `देव एकच आहे` हें तत्त्व त्याने आपले निश्चित ध्येय ठरवून एका नवीन धर्माचा प्रसार करण्याचा उपक्रम केला. नवीन मतप्रतिपादकांचा छळ न झाल्याचा दाखला जगाच्या इतिहासांत नाहीं; मग महंमदच या नियमाला अपवाद कसा होईल? मक्केंतील काबाच्या मंदिराचे धार्मिक रखवालदार सुरेश लोक यांनी त्याचा अत्यंत छळ केला; म्हणून त्याने इ.स. ६२२ मध्ये मदिनेस प्रयाण केले.तेथे त्याच्या अनुयायांची संख्या वाढली. तेथे त्यानें एकेश्वर मताचा पुरस्कार करण्यासाठी `मशिद उल्नबी` बांधली; परंतु जसजसे त्याला अधिक अधिक अनुयायी मिळू लागले तसतसा त्याचा व खुद्द महंमदांचा सुरेश लोक अधिक अधिक छळ करू लागले. त्यावेळी महंमदाने जी युक्ति लढविली तीवरून त्याचा आत्यांतिक धोरणीपणा व्यक्त होतो. या युक्तीतच त्याच्या साऱ्या चरित्राचें बीज आणि डिप्लोमसीचें वर्म सांपडतें. एरवी, नुसत्या मुक्तीच्या किंवा पारलौकीक ऐश्वर्याच्या काल्पनिक गप्पावजा आश्वासनांवर एखाद्या नव्या किंवा जुन्या धर्माचा इतका अल्पावकाशांत एवढा अतिविस्तृत प्रसार होणे कधीहि शक्य नाही. नुसत्या प्रेषितांच्या किंवा पैगंबरांच्या व्याख्यानांनी पारलौकिक सुखाच्या आशेनें चैतन्यपूर्ण होऊन जाण्याइतकी जर ही मानवी दुनिया ग्रहणक्षम (susceptible) बनलेली असती, तर प्रेषितांना आणि पैगंबरांना जन्मश्रेणींच्या चक्रावर फिरवून व्याख्याने देवविण्याची देवालाहि जरूर पडली नसती. मानव प्राणी कितीही विचारी आणि सुशिक्षित झाले असले तरी त्याची मनें जशी ऐहीक अभ्यांशाच्या गड्ड्याकडे चटकन वळतील, तशीं तीं पारलौकीक पारमेश्वरी ऐश्वर्याच्या नुसत्या कोरड्या गप्पांनी एकदम हुरळून जाऊन कांही अद्वितीय क्रांति किंवा अद्भुत पराक्रम करावयास उद्युक्त होतील, हें शक्यच दिसत नाहीं. मग आरबलोक तर उघड उघड रानटीच होते. महंमदाच्या
इस्लाम धर्माची मोहनी
त्यांच्यावर पडली. त्यांना ईश्वरप्राप्तीचा खरा मार्ग सांपडल्यामुळे ते आनंदाने बेहोष झाले आणि म्हणून इस्लाम धर्माचा प्रसार वावटळीच्या वाऱ्याप्रमाणे सर्व आशियाखंडभर करण्याचे त्यांना सामर्थ्य आलें, या विधानाची सयुक्तिकता केव्हांही कोणाला पटणार नाही. आतांपर्यंत महंमद नुसता शांतमार्गी नवधर्मप्रसारक होता. त्याच्या प्रयत्नांच्या मानानें त्याला मिळालेले अनुयायी फारसे नव्हते आणि त्याचा छळही बराच होत होता. म्हणून त्यानें आपली शुद्ध धार्मिक अशी प्रेषित-वृत्ति चटकन बाजूला ठेवली आणि एखाद्या साध्या प्रपंची महत्वाकांक्षी मनुष्याप्रमाणे एक
ईश्वरी हुकुमाचा जाहीरनामा
जाहीर केला त्यात त्याने असा स्पष्ट खुलासा केला की, `यापुढे मी सांगतो हा धर्म जे ऐकणार नाहींत, त्यांस तलवारीनं जिंकावें. लढाईत यश आल्यास शत्रूची धनदौलत आपणांस मिळेल. बरें मृत्यूच आला तर महत्पुण्य लागून स्वर्गाचा दरवाजा आपणांस खुला होईल." या जाहीरनाम्यामुळे महंमदाचा आजपर्यंतचा शांततेचा धार्मिक बाणा जाऊन त्याचे पर्यवसान खाडकन शुद्ध लौकिकी अशा लष्करी बाण्यांत झाले. कालचा मोक्षदाता महंमद आज राज्ये कमविणारा शूर योद्धा बनला. लष्करी बाण्याचा अशा रीतीने पुकारा होताच रानटी आरबांना आयताच चेव आला. राज्यपदप्राप्तीची आशा, लुटीचा लोभ, कीर्तीची आकांक्षा आणि एवढे सगळे केल्यावर अखेर
स्वर्गीय सौख्याची गॅरन्टी
यामुळे हां हां म्हणतां महंमदाभोंवती त्याच्या इस्लामी धर्माची दीक्षा घेतलेले लष्करी बाण्याचे हजारों लोक आपआपल्या शस्त्रास्त्रांसह भराभर जमा झाले.
लष्करी सामर्थ प्राप्त होतांच नवधर्मप्रसाराकरितां तुंबल युद्धे होऊ लागलीं आणि महंमद विजयी होत गेला. लढाईत मिळालेली लूट सर्वांनी सारखी वाटून घ्यावी असा आणखी एक इश्वरी जाहीरनामा प्रसिद्ध करून त्यानें आपल्या अनुयायांची भक्ति संपादन केली. नंतर मदिनेंतून शेजारच्या प्रांतावर हल्ले करण्यास महंमदाच्या फौजा भडाभड रवाना होऊं लागल्या. लुटीचा मुबलक पैसा मिळू लागल्यामुळे त्यांच्या अनुयायांची संख्या कल्पनातीत वाढून त्यांच्यांत नवधर्माचे वारे बेफाम शिरलें आणि धर्माच्या नावावर एक प्रकारचें नवीन राज्य स्थापन होऊन अखेर
धर्मोपदेशक महंमद राजा बनला
आतांपर्यंत कोणत्याही धर्माच्या कोणत्याही प्रवर्तकाला जे कार्य अर्थात विस्तृत धर्मप्रसाराचं कार्य निवळ जिभेच्या टकळीनें साध्य करता आले नाही. तेच कार्य महंमदाने तलवारीच्या पात्याच्या धमकीवर तेव्हांच घडवून आणलें. परंतु नुसत्या तलवारीनें इस्लाम धर्माची वृद्धि झाली असे नव्हे, तर इस्लामाच्या शिकवणीने मुसलमानांस तलवार गाजविण्याचें सामर्थ्य आलें त्यांची बुद्धिमत्ता विलक्षण तीव्र केली, हेंही विशेष लक्षांत ठेवले पाहिजे. ज्या मक्केनें त्याला इ. स. ६२२ मध्ये हद्दपार केलें, त्याच मक्का शहरावर इ. स. ६३० साली महंमद आपल्या दहा हजार लष्करी अनुयायांसह चढाई करून आला. शहराचा पाडाव करून काबाच्या मंदिरांतील मूर्तीचा विध्वंस करून आपल्या इस्लाम धर्माचा तेथे प्रचार चालू केला. अशा रितीने लोकोत्तर पराक्रम गाजवून धर्म आणि राजकारण यांच्या संयोगाने रानटी आरबांचे एक मोठे सुविध व बलाढ्य राष्ट्र बनविणारा पैगंबर महंमद आपल्या
इस्लाम धर्माचें अमर स्मारक
मागें ठेवून सन ६३२ त शांत झाला. त्याच्या मृत्यूनंतर केवळ ८० वर्षांच्या अवधीत त्याच्या आरब अनुयायांनी नुसतें आरबस्तानच नव्हे, तर इराण, सिरिया, पश्चिम तुर्कस्तान, सिंध, इजिप्त आणि स्पेनचा दक्षिण भाग काबीज करून त्यावर आपली इस्लामी सत्ता प्रस्थापित केली. ते जेथें जेथें मुलूख काबीज करीत गेले, तेथल्या लोकांना तलवारीच्या पात्याच्या जोरावर आपल्या धर्मात खेचून घेतलें, किंवा जेथे तलवारीची सक्ति आणि उपदेशाची युक्ति फोल ठरली तेथे जबरदस्त खंडणीच्या ठणठणीत दंडवसुलीवर त्या त्या लोकांची मृत्यूपासून मुक्ति केली. हिंदुस्थानांत इस्लाम धर्माचा प्रसार कसा झाला आणि त्याच्या प्रवर्तकांच्या हालचालीचा हिंदुधर्मावर आणि हिंदुराज्यांवर काय परिणाम झाला, हे पहाण्यापूर्वी महंमदांच्या
इस्लामी धर्माचा व्यावहारिकपणा
आपण पृथक्करणासाठीं घेतला पाहिजे. महंमदाने आपल्या धर्मप्रसाराच्या मिशनमध्ये जो एक प्रकारचा व्यावहारिकपणा (business tactics) बेमालूम रीतीने मिश्र केला; त्यावरूनच त्याच्या अचाट बुद्धीमत्तेची आणि तीक्ष्ण धोरणीपणाची खरीखुरी साक्ष पटते. महंमदाचा मुख्य हेतू हा होता की, जगांतील निरनिराळ्या धर्मपंथाना अजीबात नष्ट करून त्यांना एक धर्म द्यावा आणि आपल्या स्वदेशबांधवांस एक नीति आणि कायदा यांनी सुबुद्ध करून त्यांच्या भाग्योदयाची गुरूकिल्ली त्यांच्या हाती द्यावी. सर्वत्र ऐक्य, एका भगवंताचे भजन आणि अनेक धार्मिक बंडांची सोंगे ढोंगे यांचा नायनाट अशा त्रिदळी ध्येयाचा महंमदाचा हेतू होता. इतर धर्मप्रचारकांप्रमाणे तो जर नुसता उच्चतम धर्मरहस्याचे पोवाडे विश्वबंधुत्वाच्या ढोलकीवर गात बसला असता तर हा त्याचा हेतु इतका सफल होता ना परंतु महंमदाच्या संबंधाने विशेष कुतूहल उत्पन्न करणारी गोष्ट म्हणजे त्याचा व्यावहारिकपणा हा होय. या व्यावहारीकपणानेंच त्याच्या हातून शुद्ध धर्मोपदेशाचें तुणतुणें हिसकावून घेऊन त्याला तलवार दिली. या व्यावहारीकपणानेच त्याच्या नवधर्माला असंख्य अनुयायी मिळून, त्या सर्वांना आपल्या आत्मोद्धाराचा मार्ग सांपडला. महंमदाच्या अवतारापूर्वी रूमच्या बादशहाने क्रिस्ती धर्म स्वीकारला होता. त्यातहि पुनः अनेक पंथांची खिचडी आणि त्या खिचडीमुळे, तंट्याभांडणांची गचडी हरहमेश चालूच होती.
जुन्या यहुदी धर्मांतहि अनेक घोटाळे होतेच. या सर्व भानगडी मिटवून एका धर्माच्या छत्राखाली सर्वांचे ऐक्य घडवून आणण्याचे पुण्यकार्य करणारा एकटा महंमदच होय. ईश्वराच्या कार्यासाठी युद्धात जय मिळवावे, नाहीं तर त्याची थोरवी स्थापन करण्यासाठी आपले प्राण खर्ची घालावे, या उदात्त उपदेशाने महंमदाच्या अनुयायांत एक प्रकारच्या
मर्दुमकीचा संचार झाला
आरबस्तानांतील लोकांची सामाजिक, राजकीय, औद्योगिक, शैक्षणिक आणि धार्मिक परिस्थिती अत्यंत निराशाजनक व भिकार असल्यामुळे, इस्लामी धर्माची दीक्षा घेतांच पूर्वीच्या रानटी, बेशिस्त आणि अक्कलमंद आरब वीरांस, महंमदाच्या व्यावहारिकपणाच्या प्रत्यक्ष शिक्षणाने, आपले सर्व ऐहिक मनोरथ सहज त्याला प्राप्त करून घेता आलें.आपखुशीने किंवा बळजबरीने वाटेल त्याला मुसलमानी धर्मांत येण्याचा राजमार्ग (मुसलमानी धर्म स्वीकारताना कांही मोठा अवाढव्य विधि करावा लागत असे, असे मुळींच नाही. इस्लाम धर्मांचीं तत्त्वे ज्याला मान्य झाली तो मुसलमान झाला. म्हणजे `जो स्वतःला मुसलमान म्हणवितो तो मुसलमान` एवढाच काय तो विधि. पण अशा रीतीने आपद्धर्म म्हणून इस्लामी गोटांत शिरलेल्या कोट्यवधि हिंदुना `जो स्वतःला हिंदु म्हणवितो तो हिंदु` असला उलट उतारा देऊन हिंदु धर्माच्या माहेरघरी परत आणण्याची अक्कल आमच्या हिंदुधर्मप्रवर्तकांत असू नये, या आत्मघातकी परिस्थितीचे वर्णन कोणत्या शब्दानी करावे? वाय ५३९-३) खुला झाल्यामुळे इस्लाम धर्माच्या प्रसाराबरोबरच मुसलमानांची लोकसंख्या भराभर वाढली आणि त्याचे राष्ट्रीय महत्त्व वृद्धिंगत होऊन, त्याच्या अचाट कर्तबगारीचा महिमा कालपटावर अक्षयींचा खोदला गेला. अंदाधुंदीच्या विसकळीत लोकस्थितीत सर्व प्रकारच्या ऐक्याचा एवढा जबरदस्त जोम केवळ एका व्यक्तीच्या व्यावहारीक धोरणानें अत्यंत अल्पावकाशांत निर्माण झाल्याचे उदाहरण जगाच्या इतिहासांत इस्लाम धर्माशिवाय दुसरें नाहीं. मुसलमानांच्या कर्तबगारीची कशीहि उलटसुलट छाननी करा. त्यांत एक मुख्य गोष्ट विशेष आढळून येते! ती हीच की धर्म आणि राज्य या दोन अन्योन्यपोषक गोष्टी त्यांच्या कर्तृत्वांत बेमालूम एकवटल्यामुळे
धर्माच्या सबबीवर राज्य वाढलें
आणि राज्याच्या सबबीवर धर्माचा प्रसार होऊन, अनुयायांच्या वाढत्या लोकसंख्येनें जगतीतलांवर मुसलमानांची एक नवीन महापराक्रमी राष्ट्रीय सत्ता चालू झाली. इस्लाम धर्माभिमानी आरब धर्मप्रसाराकरितां स्वदेशाबाहेर जेव्हा हिडूं लागले, तेव्हा त्यांना जे जे भिन्न वर्णाचे व भिन्न धर्माचे लोक भेटत त्या सर्वांस केव्हां जुलमाने, केव्हां लालुचीने तर केव्हा युक्तीजुक्तीने त्यांनी ग्रासून आपल्या जुटींत आणले. अशा रीतीनें इराणांतले इराणी, तुराणांतले तुराणी, मोंगोलियांतले मोंगल, हिंदुस्थानांतले आर्य, आफ्रिकेतले शिद्दी वगैरे झाडून सारे या नवीन धर्मांत शिरल्याबरोबर एक झाले. त्यांना भाग्योदयाचा अभिनव राजमार्ग खुला झाला. वैयक्तिक पराक्रम गाजवून स्वतःच्या बऱ्यावाईट बुद्धीचा विकास करण्याची संधी मिळाली. एकजुटीने एकाच ध्येयाकरिता कस्सून उद्योग करण्याची नवीन उत्तेजक शिस्त लागली. जगाच्या पाठीवर वाटेल तिकडे मनमुराद भटकून पराक्रम गाजविण्याचे त्यांच्या अंगी सामर्थ्य आल्यामुळे, निरनिराळ्या राष्ट्रांतील निरनिराळ्या संस्कृतीचा आणि विद्येचा त्यांना पूर्ण परिचय होऊन ते अत्यंत बहुश्रुत बनले. ते आपला मूळस्वभाव विसरले आणि एकजुटीने नवीन नवीन उद्योग करून खऱ्या खुऱ्या
लोकसंग्रहाच्या जोरावर स्वराष्ट्राची स्थापना
करण्यास समर्थ झाले. नुसता त्यांचा धर्म एक झाला. एवढेच नव्हेतर, कोणत्याही ठिकाणी त्यांना उच्च संस्कृति आढळली तर तेथच्या लोकांना ते आपल्या इस्लाम धर्माच्या गोटांत खेंचून आणून त्यांची ती संस्कृतिही आपलीशी करून टाकीत. वाटेल त्या परिस्थितींतहि देशकालवर्तमानाचा विचार न करता हिंदुंप्रमाणे जुन्यांसच चिकटून राहण्याची आत्मघातकी आणि राष्ट्रघातकी प्रवृत्ति इस्लामानुयायांनी साफ झुगारून दिली. दुसऱ्यांतील चांगले असेल तें घ्यावे, त्यात नवीन सुधारणा करून त्याचा आपल्या राष्ट्रोद्धाराच्या कामीं उपयोग करावा, हा खरा लोकसंग्रहात्मक गुरूमंत्र इस्लामांनी पाळला म्हणूनच त्यांचा भाग्योदय झाला. `आधीं प्रपंच करावा नेटका मग पहावें परमार्थविवेका` या धोरणी तत्त्वाची खरी अंमलबजावणी मुसल्मानानींच केली.
`मराठा तितुका मेळवावा, आपला महाराष्ट्र धर्म वाढवावा` ही समर्थांची शिकवण मराठ्यांनी दासबोधांतच गुंडाळून ठेवली. मुसल्मानांनी मात्र `सांपडेल त्यास मुसलमान करावा, आपला इस्लामधर्म वाढवावा` ही महंमदाची आज्ञा अक्षरशः अंमलात आणली.
खरा लोकसंग्रह इस्लामानेंच केला.
आम्ही हिंदु मात्र लोकसंग्रहाच्या, एकराष्ट्रीयत्वाच्या, वेदाभिमानाच्या आणि भगवद्गीतेच्या कोरड्या गप्पाच अझून मारीत आहोत. वास्तविक पाहिले तर मुसलमानांनी या जगतीतलावर जो पराक्रम गाजविला तो क्रिस्त्यानाहि साधला नाही. राष्ट्रबंधनांस धर्माची आवश्यकता किती आहे, देश काल वर्तमानाप्रमाणे वर्तन करण्यास धर्माने प्रत्येक व्यक्तीस किती व कसें पूर्ण स्वातंत्र्य देण्याइतकी तत्त्वांची उदारमनस्कता ठेवली पाहिजे आणि बदलणाऱ्या कालाप्रमाणें बदलण्याची चिवट प्रवृत्ति लोकांत प्रस्तुत करून त्यांना आपला राष्ट्रप्रपंच प्रथम नीटनेटका थाटण्याची संधि का दिली पाहिजे, हें इस्लाम धर्मावरून शिकण्यासारखे आहें. भिन्न जातीच्या, भिन्न संस्कृतीच्या, भिन्न परंपरेच्या, भिन्न भिन्न मनोवृत्तींच्या सर्वराष्ट्रीय लोकांना इस्लाम धर्मानें एकत्र करून त्यांच्याकडून `न भूतो न भविष्यति` असा पराक्रम कसा गाजविला, यांचे रहस्य आत्मोद्धारासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक राष्ट्राला आदर्शभूत असेच आहे. मुसलमानांनी धर्मात सर्व वर्णाचे, सर्व जातीतले आणि सर्वराष्ट्रांतले लोक आहेत. त्यांना स्वधर्माचा मोठा योग्य अभिमान आहे. रानोमाळ भटकणाऱ्या रानटी धनगरांना इस्लामाने राज्यपदास कसें चढविलें, हजारो वर्षांच्या अंध:कारांतून त्यांना बाहेर कसे आणले आणि धर्म व राजकारण यांच्या जोडगोळीने त्यांना सारे जग पादाक्रांत करण्याचे सामर्थ्य कसे दिलें, याचा इतिहास नीट पाहिला की समर्थ रामदासानी कंठशोष करकरून
आपला महाराष्ट्रधर्म वाढवावा
असा हा टाहो महाराष्ट्राच्या कानीकपाळी फोडला, त्याचा रहस्यार्थ अधिक विशद करून सांगण्याची आवश्यकता राहणार नाही. इस्लामी धर्मात अनेक दोष असूनसुद्धा त्याची एवढी मोठी भरभराट कशी झाली. याचें उत्तर त्या धर्माचा व्यावहारिक बाबींकडे असणारा धोरणी कल देऊ शकतो. वाटेल तिकडे भटकावें, वाटेल ते खावें प्यावें, त्यांस आपल्या धर्मात ओढून आणावें, परजातीच्या व परधर्मियांच्या स्त्रियांचा स्वीकार करून स्वधर्मी लोकांची संख्या वाढवावी, इत्यादी व्यावहारिक महत्वाचे अनेक प्रकार इस्लामी धर्माच्या इतिहासांत जागोजाग आढळतात. आजचा हिंदुस्थानांतील मुसल्मान समाजाचा पूर्वेतिहास पाहिला तर त्यांची सारी लोकसंख्या येथीलच लोकांनी धर्मांतर केल्यामुळें व बीजसंकराने झालेली आहे. अर्थात् हिंदुस्थानांतील मुसल्मान म्हणविणाऱ्या आमच्या देशबांधवांच्या
संस्कृतीचा आत्मा आर्य आहे
तुराणी नव्हे. या एकाच गोष्टीवरून मुसल्मानी धर्माच्या सर्वव्यापक क्षेत्राचा विशाळपणा उत्कृष्टपणें सिद्ध होतो. सर्व प्रकारच्या लोकांस आपल्या धर्मात ओढून घेऊन, धर्माच्या नांवाखाली त्या सर्वाची एक जात किंवा संघ तयार करण्याचा अद्भुत गुण इस्लाम धर्मानेच शिकवावा.
`आपला महाराष्ट्र धर्म वाढवावा` ही शब्दयोजना समर्थांनी का केली, याचे खरे रहस्य हिंदुधर्माचा इतर धर्मांशीं आलेल्या संबंधाचा तुलनात्मक अभ्यास केल्याने खचित उमगण्यासारखें आहे. `महाराष्ट्र धर्म राखावा` अशी भाषा न वापरता `महाराष्ट्र धर्म वाढवावा` अशी शब्दयोजना ज्याअर्थी ठासून केलेली आहे.त्याअर्थी धर्मांतरामुळे हिंदुंच्या राष्ट्रीय संघसक्तीवर झालेला, होत असलेला आणि होणारा भयंकर आघात त्या महापुरुषाच्या उदार आणि धोरणी काळजाचे पाणी पाणी करीत असेल|
एक जाती दोन जाती पावला | तो कैसा हाणावा भला ।।
तुम्हां सकळांस कोप आला | तरी क्षमा केली पाहिजे ।।
खुषीनें किंवा नाखुषीनें, सद्धर्म किंवा आपद्धर्म म्हणून, लोभानें किया शुद्ध मूर्खपणानें धर्मांतर केलेल्या व्यक्तींना परधर्मांत मोक्षाचा खरा वा खोटा मार्ग सांपडो वा न सांपडो, मूळधर्मापेक्षा एकाच गोलांटी उडींत जगदीश्वराचें सगुण किंवा निर्गुण सिंहासन पटकवितां येणें शक्य असो वा नसो, त्यामुळे
हिंदु धर्मीयांच्या संघशक्तीचा ऱ्हास
होऊन, त्यांच्या राष्ट्रीय प्रपंचावरहि असहनीय वज्राघात होत आहे, हा हृदयभेदी देखावा पाहून समर्थासारख्या महा राष्ट्रपुरुषाचें अंतःकरण कळवळल्यामुळेंच त्यांनी आपल्या अंतस्थ वेदनांच्या संवेदना साऱ्या दासबोधात ठिकठिकाणी मोठ्या उमाळ्यानें व्यक्त करून ठेवल्या आहेत.
`देवमात्र उच्छेदिला । जित्यापरिस मृत्यू भला । आपुला स्वधर्म बुडविला । ऐंसे समजावें।। काय, यापेक्षा समर्थांनी आणखी काय हांका आरोळ्या माराव्या? त्यांनी यापेक्षा अधिक स्पष्टोक्ति ती काय वापरावी? अरे मूर्खांनो, आहांत कोठे? करतां काय? तुमचे भाऊ तुमच्या बहिणी, तुमच्यांतील कर्तबगार लोक, तुमचे कारागीर, तुमचे पंडित, तुमचे मुत्सद्दी, तुमचे शेतकरी, तुमचे सर्वस्व आज धर्मांतर करून भराभर बाहेर चालले; तुमच्या संघशक्तीला कीड लागली. तुमच्या धर्मांच्या घशाशीं बेपर्वाईचा कफ दाटून तो घाबरा झाला आहे; भक्तांचा राजरोस क्षय झाल्यामुळे
हिंदुधर्मांने डोळे पांढरे केले
आहेत; आणि कशाच्या मारता नुसत्या स्वराज्याच्या गप्पा? तुमच्या स्वधर्मांतून तुमच्याच देशबांधवांचा एकेक इसम परधर्मांत जाऊन आज तुमचा हिंदुसमाज वाळवीनें पोखरलेल्या बड्या वाशाप्रमाणें कमकुवत आणि कुचका नासका होऊन राहिला असता, तुमची संघशक्ती लंजुर झाली असतां, तुम्ही कशाच्या धमकीवर स्वराज्याची अपेक्षा करतां? तुमचेच देशबांधव, तुमचेच धर्मबांधव परक्या धर्माचे अनुयायी बनून, त्या दत्तक धर्माच्या अभिमानाने प्रेरीत होऊन तुमच्या घरातील सारी बरींवाईट कर्मे त्या परक्यांना समजावून देत आहेत, आणि परकी धर्माचे भाडोत्री विरळ कवच वर पांघरून तुमच्याच विरुद्ध प्रत्यक्ष युद्ध करण्यास अगर आंतून कारस्थानी सूत्रे चालविण्यास हजारोंनी तयार असतांना, मूर्ख महाराष्ट्रीयांनो, कशाची करतां स्वराज्याची अपेक्षा? तो एकटा शिवबा कोठकोठें पाहणार आणि करणार तरी काय काय?
रायांनी करावे राजधर्म । क्षत्रीं करावे क्षात्रधर्म ।।
ब्राम्हणीं करावे स्वधर्म। नानाप्रकारें ।।
त्याची शिकस्त तो करीतच आहे. पण तुम्ही तरी आपापली कर्तव्ये कराल कीं नाही?
राज्य नेलें म्लेच्छक्षेत्रीं । गुरुत्व नेलें कुपात्रीं ।।
आपण अरत्रीं ना परत्रीं । कांहीच नाहीं ।।
रामराम!! अरे ही दुःस्थिति, हा तुमच्या धर्माचा ऱ्हास, प्रत्यक्ष तुमच्या राष्ट्रीय संघशक्तीचा ऱ्हास, तुमच्या सामाजिक सामर्थ्याला लागलेला वणवा तुम्हांला पहावतो तरी कसा? हे प्रतापगडचे श्रीभवानी आंबिके, धर्मांतर करून भडाभड लाखों हिंदु परधर्मांत जात आहेत, तरी या मूढ हिंदुधर्मीयांचे डोळे उघडत नाहीत. अतां तूं तरी या रामदासाच्या आंतड्याला पडणारे पीळ पहा आणि
देवांची राहिलीं सत्त्वें । तूं सत्त्व पाहसी किती ।।
भक्तांसी वाढवीं वेगीं । इच्छा पूर्णचि ते करी ।।
महाराष्ट्रीयांनो तुम्हांला जर खरोखर आत्मोद्धाराची कांहीं चाड असेल, "राजकारण जरी उदंड तटलें" असलें तरी बाबांनो "सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणे काय तुम्हांप्रति । संभाळली पाहिजे ।।" म्हणून
मराठा तितुका मेळवावा । आपुला महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।
ये विषयी न करितां तकवा । पूर्वज हासती ।।
शहाणे करावे जन । पतित करावे पावन ।।
सृष्टीमध्यें भगवभ्दभजन वाढवावे ।।
अहाहा! यापेक्षां अधिक स्पष्टोक्ती समर्थांनी काय करावी? त्यांच्या उद्गारांवरून इस्लाम धर्माच्या धार्मिक आगापेक्षां त्याच्या व्यावहारिक बाजूनें हिंदु धर्मांची केवढी नासाडी केली, यांचें अंतःकरण थरथरविणारे चित्र १७ व्या शतकांतल्या समर्थांना जसें स्पष्ट स्पष्ट समजत होतें, तसें २० व्या शतकांतल्या निवळ विचक्षण चिकित्सामन्यांना उमजणें शक्य नाही. शिवाय, महंमदाच्या अत्यंत धोरणीपणामुळे त्याने अल्पावकाशातच रानटी आरबांना एका धर्मदिक्षेच्या सबबीवर केवढ्या राष्ट्रीय महतीला आणून ठेवलें, हें समर्थ जाणत नव्हते असे गृहीत धरणे, म्हणजे समर्थासारख्या अक्षरशः समर्थ लोकोत्तर विभूतीला महंमदापेक्षाहि खालच्या पायरावर बसवून आमच्या मूर्खपणाचे व
कृतघ्नपणाचें प्रदर्शन
करण्यांसारखेच होय. `शक्तीने मिळती राज्यें । युक्तीने यत्न होतसे । शक्तीयुक्ती जये ठायीं । तेथें श्रीमंत धांवती ।` हा सिद्धांत कंठशोष करून सांगणारे १७ व्या शतकांतले रामदास किंवा १४ व्या शतकांतले विजयनगर साम्राज्याचे संस्थापक श्रीविद्यारण्य माधवाचार्य यांना इस्लामधर्माच्या भरभराटीची खरी मख्खी पूर्णपणे अवगत होती, म्हणूनच त्यांनी आपापल्या अनुयायांना मोठ्या कळवळ्याने कलियुगात
संघशक्ती हाच आत्मोद्धार
हा दिव्य मंत्र सांगितला. पतित बांधवांना पावन करून घ्या, मराठ्यांची संख्या वाढवून त्यांची संघशक्ती वाढवा, आणि महाराष्ट्र धर्माचा-हिंदु धर्माचा सर्वत्र प्रसार करा. हें महत्कार्य साधण्यासाठी नुसत्या महाराष्ट्रांतच किंवा हिंदुस्थानांतच हा धर्मप्रसार करून स्वस्थ बसू नका तर
महंते महंते करावे । युक्ति बुद्धीनें भरावे ।।
जाणते करोनि विखरावे । नाना देशीं ।।
हिंदुधर्माचे साम्राज जगभर वाढवा, हिंदुधर्माचीं सनातन सर्वव्यापी तत्त्वे जगाला शिकवा, पतित असतील त्यांना पावन करून घ्या आणि ज्या हिंदुस्थानानें पूर्वी एकदां साऱ्या जगावर जगद्गुरूपणाची सत्ता गाजविली त्याच हिंदुस्थानाच्या
हिंदुधर्माला साऱ्या जगाचा गुरू करा
ही समर्थांची समर्थ वाणी उर्मट महाराष्ट्राने धिक्कारली, त्यांचीं विषारी फळे तो आज आपल्या आसवांनी चिंब भिजवून हुंदके देत देत खात आहे. उलटपक्षी महंमद पैगंबराच्या इस्लाम धर्माने रानटी आरबांचे काय स्थित्यंतर केले ते पहा. या धर्माच्या अनुयायांना धार्मिक, सामाजिक, राजकीय वगैरे बाबतीत कसलाही प्रतिबंध नसल्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या कर्तबगारीचा विकास होऊ देण्यास कोणतीही अडचण नसल्यामुळे आणि धर्मप्रसाराच्या सबबीवर अनेक परंपरेच्या आणि अनेक भिन्नभिन्न, संस्कृतींच्या सर्वराष्ट्रीय मंडळींचा एक जबरदस्त
बिरादरकीचा संघ
आस्तित्त्वांत आल्यामुळे, शास्त्र तत्त्वज्ञान वाङ्मय इत्यादी बाबतींत आरब पंडितांनी खलीफांच्या पदरीं राहून अलौकिक कीर्ति संपादन केली. या बाबतीतला त्यांच्या अचाट उद्योगाचा इतिहास पाहिला की त्यापुढे तत्कालीन क्रिस्ती राष्ट्र हीनदीन व रानटी दिसतात. इ.स. ७०५ च्या सुमारास अल्जबर ऊर्फ बीजगणित आरबानींच प्रथम स्पेन देशांत नेले. गणितशास्त्र भूगोल खगोल वैद्यक इत्यादि विषयांतले आरबांचे प्रयत्न आजलाहि सर्वत्र मान्य आहेत. ग्रीक संस्कृत खाल्डी फारशी भाषेतील उत्तमोत्तम ग्रंथ मिळवून त्यांची त्यांनी फारशी भाषांतरे केली. कादंबऱ्यांचे रचनाचातुर्य इराणी लोकांपासून घेऊन, अरेबियन नाइट्स ग्रंथाने त्यांनी कादंबऱ्यांच्या बाबतीत केवळ इराणलाच नव्हे तर साऱ्या जगाला अगदीं चकित करून सोडले. होकायंत्राचा उपयोग प्रथम आरबांनीच प्रचारात आणला. वैद्यक विषयास शास्त्रीय स्वरूप त्यांनींच दिलें आणि गणितांतली दशांशपद्धति मूळ आरबी मुसलमानांनीच शोधून काढली. हे त्यांचे विविध प्रयत्न युरोपच्या अर्वाचीन प्रगतीस बऱ्याच अंशी कारणीभूत झाले, ही विशेष महत्वाची गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे. युरोपांतील क्रिस्ती राष्ट्र निद्रावस्थेत ढणढणा घोरत पडली असतां, बगदाद कायरो व कोर्डोव्हा येथील विद्यालयें सर्व जातींच्या व सर्व धर्माच्या लोकांस ज्ञानामृत पाजून ज्ञानवृद्धि करीत होती, याची साक्ष द्यायला कायरो येथील आरबांचे प्राचीन विश्वविद्यालय अजून हयात आहे.
शिल्पशास्त्रांतहि मुसलमानांनी इतकें अद्वितीय कौशल्य दाखविलें कीं, त्यांनी बांधलेल्या इमारती, थडगीं, मशिदी व मनोरे यांची सर सुधारणेचा जागताजोग टेंभा मिरवणाऱ्या पाश्चात्य क्रिस्त्यांनाहि अजून साधतां येत नाहीं. खुद्द हिंदुस्थानांतील मुसलमानांची शिल्पी कामगिरी पाहिली तरीसुद्धां ताजमहल, कुत्बमिनार, फत्तेपुरी मशिद, अहमदाबादचा झुलता मनोरा, विजापुरचा बोलघुमट, इब्राहीम रोझा इ. अनेक इमारती युरोपियन विंजणेरांच्या अकला कुंठीत करीत आहेत. पूर्वीच्या खलीफांच्या अमदानींत
बगदाद म्हणजे विलायत
होती. ठिकठिकाणचे विद्यामुमुक्षु बगदाद येथे ज्ञानार्जनार्थ जात असत. हिंदुस्थानाचेहि बरेच विद्वान येथें जाऊन रहात असत. चरक व सुश्रुत या दोन आर्यवैद्यक ग्रंथांचे आरबी तर्जुमे दोघा ब्राम्हणांनी मुसलमानांस करून दिले. थोडक्यांत समारोप करावयाचा म्हणजे "जगाच्या संस्कृतींत मुसलमानांनी मोठीच भर घातली आहे. प्राचीन काळच्या प्राच्यसुधारणेंत जेवढें म्हणून चांगले होतें, तेवढे सर्व ग्रहण करून आणि त्यांत स्वतःची पुष्कळ भर घालून. त्यांनी तो भाग क्रिस्ती युरोपास दिला; आणि त्याच्यावरच अर्वाचीन युरोपियन सुधारणेचा पाया रचलेला आहे." असा जो सर्व निःपक्ष आणि निर्विवाद विद्वान इतिहासकारांचा शेरा पडलेला आहे, तो किती वाजवी आहे. हें सुज्ञांस सांगायला नको. आता आपण आपल्या हिंदुस्थानाकडे आणि हिंदुधर्माकडे किंचित वळूं. प्राचीन इतिहासाची आणि हिंदुधर्माच्या सर्व मुख्यमुख्य वेदोपनिषदादि ग्रंथांची पारायणें करणारें सुप्रसिद्ध पाश्चात्य पंडित मॉन्यर विल्यम यांनी हिंदु लोकांच्या संस्कृतीबद्दल असें उद्गार काढले आहेत कीं, "आमच्या पूर्वेकडील साम्राज्यात आम्हाला अगदी साध्याभोळ्या आणि लेच्यापेच्या लोकांशी वागावयाचे आहे, असें मात्र कोणींहि समजूं नये. युरोपातल्या उत्कृष्ट सुधारणेपुढें आणि उच्च बुद्धीमत्तेपुढें तेव्हांच वितळून जाणाऱ्या रानटी असंस्कृत लोकांशी येथें आमची गांठ पडली आहे, असेंही कोणीं समजूं नये. ज्या मूळ मानवी कुळींतून त्यांची उत्पत्ती झालेली आहे, तिच्याच एका शाखेचा धागा आमच्या उत्पत्तीशी बिनतोड लागू करणाऱ्या अशा अत्यंत प्राचीन, अत्यंत थोर आणि कुशाग्र बुद्धीच्या लोकसमूहाशीं आमची गांठ पडलेली आहे. ज्यावेळी
आमचे बापजादे रानटी होते,
संस्कृति आणि सुधारणा कशांशीं खातात याची त्यांना दख्खलसुद्धां नव्हती. त्यावेळी हे हिंदुलोक सुधारणेचा अत्युच्य शिखरावर आरूढ झालेले होते. इंग्लिश हें नांवसुद्धां अस्तित्त्वांत येण्याच्या पूर्वी शेकडों शतके यांची भाषा उत्कृष्ट कमावलेली व वाङ्मयपूर्ण परिणतावस्थेला पोहोचलेली होती आणि त्यांचे तत्त्वज्ञानहि अत्यंत गूढावस्थेपर्यंत प्रभुद्ध झालेलें होतें. "हिंदुच्या हिंदुधर्माचा अभिमान हिंदुंना साहजिकच विशेष, तेव्हां त्याच्या सर्वव्यापी उत्कृष्टपणाबद्दल हिंदु पंडितांचे दाखले देण्यांत अर्थ नाही. परंतु अनेक महाभयंकर दिव्यांतून पार पडून आजलाहि आपल्या अभंग सात्विक तेजाने ताठ उभा राहणारा आणि अनेक क्रिस्ती धर्मानुयायी पाश्चात्यांच्याहि हृदयांस हालवून सोडणारा.
आमचा प्यारा हिंदुधर्म
यानें आपल्या दिव्य तेजानें पाश्चात्यांच्या तोंडून काय काय उद्गार वदविले आहेत, त्यांतील निवडक एकादोनच उतारे मात्र येथे नमूद करूं. जगप्रसिद्ध अॅनी बेझंटबाई "Sanatan Dharma, Advanced Text Book" ची सुरवात करतांना म्हणतात. "श्रीगणेशायनमः सनातन धर्म ऊर्फ वैदिक धर्म याचा पाया वेदावर आहे. हा सर्व धर्मांत अत्यंत पुरातन असा धर्म असून याच्या तत्त्वज्ञानाच्या गांभिर्याची आणि ऐश्वर्याची सर कोणत्याही धर्माला येत नाही. शिवाय त्यांतील नीतिशास्त्राची सात्विक शुद्धता आणि निरनिराळ्या संस्कारपूर्ण क्रियाकर्मादि विधींचा सोईस्करपणा आणि लवचिकपणा यांत तर तो दुसऱ्या कोणत्याही धर्माला हार जाणार नाहीं. हा धर्म नदीच्या पात्राप्रमाणे आहे. कित्येक ठिकाणी इतका उथळपणा आढळतो कीं, लहान लहान मुलांनीं सुद्धां त्यांत खुशाल डुंबत रहावें आणि त्यांतील कित्येक ठिकाणें इतकी खोल आणि अगम्य आहेत कीं मोठ्या मोठ्या पट्टीच्या पाणबुड्यांनाहि त्याचा अंत लागणार नाही. मानवी प्राण्यांच्या मुमुक्ष वृत्तीच्या निरनिराळ्या भावनांना रूचेल आणि पचेल अशीच त्याची सोईस्कर ठेवण आहे.
बरें या या वैदिक धर्माची पूर्णावस्थहि इतक्या उच्च संस्कृतीला जाऊन भिडली आहे कीं, त्याला इतर कोणत्याहि धर्मांतून काहिंहि मिळवण्यासाठी आवश्यकताच उरलेली नाहीं; तसा त्याने कधी यत्नहि केला नाहीं आणि हिंदु धर्माच्या सर्वांग सौंदर्यात आम्ही आणखी कांही भर घालूं; अशी कोती घमेंड इतर कोणत्याही धर्माला न शोभणारहि नाहीं. तसे या धर्मांचें परिशीलन करावें तसतसा मनुष्याच्या बुद्धीवर अधिकाधिक प्रकाश पडत जातो आणि त्यांतील तत्त्वार्थबोधानें
अंत:करण गारीगार होऊन जातें
या वैदिक सनातन धर्माचें प्रत्येक तरुणानें नीट अध्ययन करावें. सुखाच्या समृद्धीचा हाच एक खरा राज मार्ग आहे. आणि आपत्प्रसंगी आत्मबळ वृद्धिंगत करून आमरण आपलें संरक्षण करणारा हाच एक धर्म होय, हें त्यांच्या निदर्शनास आल्यावाचून खास रहाणार नाही." ज्या हिंदुधर्मानें अर्वाचीन अनेक उपऱ्या प्रतिबंधनाच्या शृंखला तडातड तोडून, हजारों मैलावर, पृथ्वीच्या दुसऱ्या गोलार्धावर राहणाऱ्या मॅडम ब्लॉवट्स्की, कर्नल ऑल्कॉट, मिसेस अॅनी बेझट लेडबीटर इत्यादि शेकडो पाश्चात्यांच्याहि अंतःकरणाला आपल्या सात्विक मोहिनीच्या शरसंधानाने अचूक विद्ध करून या पुण्यवान् भरतभूमीच्या दर्शनाकरितां खेंचून आणले; ज्या हिंदुधर्माच्या वेदोपनिषदांच्या अखंड पारायणांनी मॅक्स मुल्लरसारख्या क्रिस्तानुयायाला अखेर अखेर
पूर्ण संन्यासी बनविलें
आणि ज्या हिंदुधर्माची सनातन तत्त्वे महाभाग स्वामी विवेकानंदाच्या ओजस्वी वाग्गंगेतून भराभर कोसळू लागतांच क्रिस्ती अमेरिकनांनी ती झटपट आपल्या कानांच्या ओंझळीनें गोळा करून स्वानंद साम्राज्याच्या सुखानुभवाने ते तर्र झाले-नव्हे, उपनयन (Initaiation) विधीचीहि पर्वा न करता ते अंतर्बाह्य हिंदु बनले; हिंदुधर्माची महती अधिक वर्णन करणें म्हणजे पाश्चात्यांच्या लाडक्या शेक्सपियरच्या
TO PAINT THE LILY IN GOLD
या वाक्याची कोणाला आठवण होणार नाही? हिंदुधर्म अत्यंत प्राचीन काळापासून ज्या ब्रम्हज्ञानप्राप्तीच्या अनेक मार्गाचा डंका गाजवीत आहे. तें
ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोष्टी
कीं वाटेल त्या टारगटाने चार चटोर पोरी चव्हाट्यावर आणवून त्यांच्याकडून साऱ्या जगाला मोक्ष देण्याची बाष्फळ बडबड करावी! अहो, नुसती एखादी नोकरी मागायला जातानासुद्धा एखाद्या अधिकाऱ्यापुढे किती विनयाने आणि दक्षतेंने जावें लागतें तर मग अत्यंत प्राचीन असा जो जगांतील सर्व धर्माचा राजा, सर्व धर्माचें मूळ सर्व धर्माचें माहेरघर जो सनातन वैदिक हिंदुधर्म त्याच्या राजवाड्यांत जाऊन
ब्रम्हज्ञानाच्या स्वराज्याची सनद
मागतांना तुम्ही किती तीव्र मुमुक्ष वृत्तीने गेलें पाहिजे बरें? हिंदुधर्म हा अगिणित धर्मरत्नांनी खच्चून भरलेली खाण आहे आणि जगांतील प्रचलित सर्व धर्म हे याच खाणींतले तेजरवी हिरे आहेत. बादशहाच्या किरीटावर जाऊन बसला म्हणून साऱ्या जगांत मीच काय तो एक तेजस्वी हिरा, मीच साऱ्या जगाला प्रकाशित करतों, माझ्या तेजाची सर कोणालाहि येणार नाहीं. अशी जर बाष्कळ वल्गना कोहीनूर हिरा करू लागला, तर त्याला आम्ही एवढेंच सांगू की बाबा कोहीनूर बांधवा, स्थानमहात्म्याने असा एकदम हुरळून जाऊ नकोस, ज्या गोवळकोंड्याच्या खाणीतून तुझा जन्म झाला. त्याच समृद्ध आणि श्रीमंत मातेच्या उदरांत तुझ्यासारखे अनंत कोहिनूर निर्माण करण्याची धमक आहे.
तिनें आजपर्यंत तुझ्यासारखे अनेक कोहीनूर या जगावर पशाशानें उपसून उधळलेले आहेत आणि अझूनही लागतील तितकें, वाटेल त्या आकाराचे, वाटेल त्या घडणीचे आणि वाटेल त्या वजनाचे अनेक सवाई कोहीनूर निर्माण करण्यास
तुझी गोवळकोंड्याची आई
समर्थ आहे बरं!! हिंदुंच्या दिव्य धार्मिक ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास करून अंतर्यामी पूर्ण हिंदु बनलेले, परंतु लोकलज्जेस्तव क्रिस्ती राहिलेले सुप्रसिद्ध विद्वान क्रिस्ती पंडित मॉन्यर विल्सम्सने तर अशी चोख जबानी दिलेली आहे (पहा Introduction, pxxvii, Indian Wisdom) की `या हिंदु धर्माचें स्वरूप अनंतवेषी आहे आणि यांतील तत्त्वाची व्यापकता तर अद्वितीय आहे. (Multiform character and singular expansibility of the Hindu religious creed.) या वैदिक धर्मात इतर सर्व धर्मातली तत्त्वे खच्चून भरलेली असून, तीं मानवजातींतील हरएक प्रकारच्या मनोवृत्तीला रूचतील आणि पचतील अशींच आहेत. याच अद्वैतवाद, द्वैतवाद, एकेश्वरी, अनेकेश्वरी, फार काय नास्तिक मतसुद्धा झाडून साऱ्या मताचा बेमालूम पुरस्कार करण्यांत आलेला आहे.` असा हा सर्वव्यापी हिंदुधर्म एकेश्वरी इस्लाम दिव्यांतून पार पडतांना इतका बेजार कां झाला? आणि पिता पुत्र पवित्र आत्माच्या त्रिदळी तत्त्वाचा पुकारा करणाऱ्या क्रिस्ती धर्मापुढें हात कां टेंकू म्हणतो? (मागे एकदा मुंबई सुप्रसिद्ध नागरीक पुढारी सर मंगळदास नथुभाई K.S.I. यांना ख्रिस्ति होण्याचा एका पाद्री दलालाने यत्न चालविला असता शेटजी म्हणाले, "अरे, आम्हा हिंदुलोकांना ख्रिस्ति होण्याची काही जरूर नाही आम्ही स्वभावताच ख्रिश्चन आहोत, तुमच्या बाप्तिस्म्याने अधिक काय होणार? पण बाबा ईश्वराने मोठी खैर केली की, तुम्हा इंग्रजांवर ख्रिस्ति धर्माच्या दीक्षेच्या चाप पाडला, नाही तर हा वेळ पावेतों तुम्ही सान्या जगाची हाडेहाडे की रे काढली असतीत.` (But I thank god that you English were converted to christianity, or you would by this time have eaten up the world to the bone.)
हा कोहीनूर काय गोवळकोंड्यांच्या आईच्या श्रीमंतीची अब्रु घेणार? झाडावरच्या फळाच्या आघाताने काय मूळ झाडच कोसळून पडणार? नाहीं. असे, कधी पूर्वी झाले नाहीं. आणि पुढें होणेंहि शक्य नाही. अशी
इतिहास ठांसून ग्वाही देतो,
मग हिंदुंचे आणि सनातन हिंदुधर्माचे आज नाक खालीं कां? पूर्वी साऱ्या जगाला भारी झालेले हिंदु आज कोठें आहेत? कां, हिंदुधर्मानें आपल्या सर्वस्वाचें साम्राज्य पारलौकिक तत्त्वज्ञानांतच कोंदणांतल्या हिऱ्याप्रमाणें मर्यादित केल्यामुळे तो आणि त्याचे अनुयायी ऐहिक बाबतींत नामर्द ठरले? काय, झालें तरी काय कीं इस्लामाची छातीठोक मुसंडी आणि क्रिस्त्यांची कावेबाज खुरमुंडी येतांच हिंदुधर्मीयांना `दे माय धरणी ठाय` होऊन जावें, त्यांचा राष्ट्रीय दर्जा वितळून जावा, त्यांना मानवी समाजात शेवटच्या नंबरावर बसणें प्राप्त व्हावें आणि गुलामगिरी पलीकडे त्यांना तरणोपायहि उरूं नये? ही अशी क्रांति कशानें झाली?
याचें उत्तरहि इतिहास देईल.
आमचा सनातन हिंदुधर्म आणि त्या धर्माचे प्रचारक यांचा पूर्वीपासून आतांपर्यंतचा इतिहास पाहिला, तर आमच्या हातांत चिंतामणी असून आंम्हीं त्याचा नीट उपयोग केला नाहीं. असें म्हणणें प्राप्त होतें. हिंदुधर्म हा सर्व आर्य मानवकुळाचा अत्यंत प्राचीन मूळधर्म असून, पूर्वी याच धर्माचे अनुयायी असलेले आर्यलोक आज साऱ्या जगभर परसलेले आहेत. हे आर्यलोक इराणांत गेले, तेथें त्यांनी झोरास्टरी धर्मशाखेला वाठविली. भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील प्रदेशांत त्यांनी वस्ती केली. तेव्हां तेथेहि ग्रीस आणि रोम या राष्ट्रांच्या प्राणप्रतिष्ठेबरोबरच हिंदु धर्माच्या नवीन आवृत्तीचे राष्ट्रीय धर्मपंथ स्थापन करून, लॅटिन भाषा बोलणाऱ्या मानवांचा उद्धार केला. याच आर्यकुळीच्या वंशजांनीं आपला विस्तार साऱ्या युरोपभर करून, जेथें जेथें ते गेले तेथें तेथें त्यांनी आपल्या प्राचीन हिंदुधर्मातील स्वातंत्र्याची कधीहि न मरणारी आवड आणि
परिणत स्वराज्यवादाची तत्त्वें
यांचा प्रसार केला.
स्वीडन-नार्वे, इंग्लड, जर्मनी आणि स्लाव लोकांचे प्रदेश येथेंहि याच आर्यलोकांमधील खेडवळांनी आपापल्या सर्व आर्यसंस्कृतीचा प्रसार केला. परंतु येथें एक गोष्ट मुख्यत्वेंकरून लक्षांत ठेवली पाहिजे कीं, अत्यंत प्राचीन काळीं एकाच सनातन वैदिक धर्माचे अनुयायी असणाऱ्या या आर्यकुळीच्या लेकरांनी साऱ्या जगभर जरी आर्यसंस्कृतीचा जबरदस्त फैलावा केला, तथापि त्यांनी प्रत्यक्ष आर्यधर्माला मात्र तिकडे नेलें नाहीं. प्रत्यक्ष आर्यधर्म किंया सनातन वैदिक धर्म जरी त्यांनी पुढें आपल्या आचरणांत आणला नाहीं, तरी त्यांनी वसाहतीच्या देशकालवर्तमानाप्रमाणें जो जो धर्मपंथ अस्तित्त्वांत आणला त्याचा पाया मूळ वैदिक धर्मांतील सनातन तत्त्वांवरच त्यांना उभारणे भाग पडलें.अर्थात् त्यांच्या नवीन धर्मांनी जरी नामरूपाचें नवीन लेणें पांघरले तरी त्यांचा आत्मा वैदिक धर्मांतील सनातन तत्त्वांच्या किरणांनींच प्रकाशमान झाला, ही गोष्ट मत्सरी हठ्ठवाद्यांशिवाय वाटेल त्या विवेकी व विचारी मनुष्याला इतिहास सप्रमाण पटवून देतो.
मानवांच्या उत्क्रान्तीचा इतिहास
पाहिला, कीं ज्या वेळीं सुधारणेच्या नव्या मन्वंतराचा उषःकालीन प्रकाश पडतो आणि नवीन प्रगतीच्या नवीन भावनांनी समाजांत एक प्रकारची चेतना उत्पन्न होते, तेव्हां तिच्या पाठीशी धर्माची एक अभिनव कल्पना उभी असते. अशा वेळीं कोणी लोकोत्तर महापुरुष प्रगट होऊन, देश काल जनता आणि तिच्या रसरसणाऱ्या आकांक्षा यांना पटेल अशा नवीन सांच्यांत मूळच्याच धर्मातील तत्त्वांचा तो मोठ्या चतुराईने पुकारा करतो. या इतिहाससिद्ध परंपरेचा किंचित् समतोल भावनेनें विचार केला म्हणजे `क्रिस्ती इस्लामी झरतुष्टी यहुदी किंवा जगांतील कोणत्याही लहान मोठ्या धर्मपंथांतील सर्व तत्त्वें हीं हिंदुधर्म आणि हिंदुंचे प्राचीन सनातन तत्त्वभंडार यांतीलच पिल्ले होत` असा जो खणखणीत शेरा अनेक विद्वान विचारवंतांनी दिलेला आहे, त्यांतील मर्म आमच्या वाचकांच्या ध्यानीं येईल. आर्यांच्या मूळ वसतिस्थानांपासूनच्या त्यांच्या चळवळीचें आणि हालचालींचे सिंहावलोकन या छोटेखानी पुस्तकांत करणें शक्य नाहीं, तथापि इतकें मात्र सांगितलें पाहिजे कीं, आर्याच्या अनेक शाखा जरी सर्व युरोपखंडभर वसाहत करून पसरल्या, तरी त्यांचा मूळसंघ मात्र हिंदुस्थानांतच उतरला. या दोन संघांचा इतिहास अगदीं वरवर पाहिला तरी एवढें चटकन ध्यानीं येईल कीं, पश्चिमेकडे गेलेल्या संघांनी
पुनर्घटनेच्या तत्त्वाचा पूर्ण स्वीकार
करून ग्रीससारखी लोकसत्तात्मक राज्यें स्थापन केलीं आणि पूर्वेकडे म्हणजे हिंदुस्थानांत उतरलेल्या मूळसंघानें मात्र कधीं अमिरी राज्यपद्धतीचा (Aristocracy) तर कधीं अनियंत्रित राज्यपद्धतीचा (Autocracy) अवलंब केला. पाश्चिमात्य आर्यांनी देशकालवर्तमानानुसार पुनर्घटनेच्या तत्त्वाचा पूर्ण अंगीकार केला आणि पौर्वात्य आर्यांनीं क्रांतिचक्राचा तडाखा आतां बसणार इतके समजून उमजून सुद्धा परंपरेच्या कोत्या अभिमानामुळे पुनर्घटनेला अगदीं अखेर अखेरपर्यंतहि संमति दिली नाही. आर्यांचा वैदिक सनातन धर्म उदारमतवादी आणि सर्वव्यापी खरा, परंतु जसजसा काळ लोटला तसतसा त्यात
संकुचित भावनेचा प्रवेश
होऊ लागला. चतुर्वर्णव्यवस्था कशामुळें कां निर्माण होईना; परंतु तिच्या शुद्ध व्यावहारिक सवलतीचें पर्यवसान वर्णावरून वर्गावर व वर्गावरून अखेर असंख्य जातींत झालें.ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र या वर्गाची वसाहत-प्रवृत्ती जसजशी वाढली, तसतसें त्यांचे लक्ष सहाजिकच ऐहिक उन्नतीकडे लागले आणि वैदिक धर्माचें सगळें गाठोडें त्यांनी ब्राह्मण वर्गाच्या हवाली करून आपण मोकळे झाले.
क्षत्रियांचे सारे लक्ष धनुर्विद्येकडे आणि वैश्यांचे तागडीयोगाकडे लागल्यामुळें, ब्राह्मणांना अर्थातच धर्माच्या संरक्षणाकडे विशेष लक्ष देणें भाग पडलें आणि धर्मसंरक्षणाच्या बाबतींत जर त्यांनी घेतली ती मेहनत घेतली नसती तर क्रिस्तीशकाचा उदय होण्यापूर्वीच शेंकडो वर्षे या सनातन वैदिक धर्माचे पृथ्वीतलावरून सफाई उच्चाटन झाले असते. परंतु धर्माचा सारा मामला एकट्या ब्राह्मणांवर पडल्यामुळे त्यावरील
डिमॉक्रॅटीक नियमनाचें दडपण
नाहींसे झाले आणि वैदिक धर्म म्हणजे ब्राह्मणांच्या हातचा मेणाचा गोळा बनला. यज्ञयागादि कर्मकांडाच्या कांडणात धर्माच्या शुद्ध अध्यात्मिक भागाचा भूस निघाला. सर्व वर्णांना धर्म शिकविणारे एकटे कायते आपण या भावनेमुळे ब्राह्मणांच्या आचारविचारांतही एक प्रकारचा एकलकोंडेपणा व अनियंत्रितपणा डोकावू लागला. येईल त्याला आपल्या संघात सामिल करून घेऊन त्याला वैदिक धर्माचा अनुयायी बनविण्याची प्राचीन आर्यांची पद्धति ब्राह्मणांनी बंद पाडली. आणि आचारविचारांच्या नियमनांचे कडकडीत नियम करून धर्माच्या सर्वव्यापी आणि सर्वग्राही पराक्रमाच्या नाड्या आंखडून टाकल्या. निरनिराळ्या उपास्य देवदेवतांची महात्मे व पुराणें लिहून धर्माचे रहस्य संस्कृत भाषेच्या लोखंडी पिंजऱ्यात मोठ्या बंदोंबस्तानें अडकवून ठेवलें. स्त्रियांनी व शूद्रांनी वेदाक्षर ऐकूंसुद्धां नये वगैरे कोत्या बुद्धीचे आणि मनाच्या क्षुद्रतेचे द्योतक असे नवीन नियम तयार करण्यांत आले. ब्राह्मणांनी रचलेले `ब्राह्मण` ग्रंथ पाहिले की, त्यांतील धर्माचें स्वरूप शुद्ध यांत्रिक, बेजीव आणि अनेक लडथडीच्या अगडबंब व्रतें-वैकल्यांनी गजबजलेले दिसतें. क्षत्रियांचा आणि वैश्यांचा दिवसेंदिवस भाग्योदय होऊं लागल्यामुळे, निदान धर्माचें साम्राज्य तरी कायमचे आपल्या एकट्याच्याच हातांत राहावें म्हणून ब्राह्मणांनी धर्मप्रसाराच्या आणि धर्मोपदेशाच्या
पात्रापात्रतेचा लटका प्रश्न
नवीन उपस्थित करून, धर्माची व्याप्ति शक्य तितकी संकुचित, मर्यादित आणि सोंवळी करून ठेवली. ऋग्वेदांत जातींच्या बंडाचा कांहींही मागमूस लागत नाही. क्रिस्ती शकापूर्वी ३०० वर्षांपासून मात्र जातींचा वास येंऊ लागतो. पुढें निरनिराळ्या कर्मविधिबंधनांच्या नवीन उपस्थित केलेल्या भानगडीमुळे चतुर्वर्णांत अनेक जाती निर्माण झाल्या. त्यांच्यांत सवत्या सुभ्याची, एकलकोंडेपणाची आणि परस्पर मत्सराची संघशक्तीस विघातक अशी कल्पना रूढ झाली. पुढें जातिसंस्थेसारख्या शुद्ध
सामाजिक संस्थेचें धार्मिक स्वरूपांत पर्यवसान
झाल्यामुळे `एकम् सत्` तत्त्वाच्या आद्यप्रतिपादक सनातन धर्मानुयांयीत फूट पडत गेली, मत्सर वाढला आणि परस्परांविषयी बेपर्वा वर्तन वाढल्यामुळें धर्माच्या शुद्ध स्वरूपाचा विचका होऊन, हिंदुधर्म निर्जीव आणि बेकर्तबगार ठरला.
अन्ये कृतयुगे धर्मास्त्रेतायां द्वापरेऽपरे । अन्ये कलियुगे नृणां युगऱ्हासानुरूपतः ।।
- म. भा. शांति.
धर्मांचीं सनातन तत्त्वें कायम ठेवून `युगऱ्हासानुरूपतः` सामाजिक जीवनांत उदार धोरण ठेवण्याची प्राचीन वृत्ति ब्राह्मणी धर्माच्या मगरुरपणामुळे ठार मेली. नवजीवनाचे नवीन विचार समाजांत उत्पन्न झाले तरी त्यांचा स्वीकार करून त्याचा समाजहितवर्धनार्थ उदारपणानें उपयोग करून घेण्याची व्यापक बुद्धि मंजूर झाल्यामुळे मूळधर्मातून अनेक नवीन धर्मपंथ निघाले आणि त्यामुळे हिंदुंच्या संघशक्तीचा ऱ्हास होऊं लागला. धर्मप्रचारकांनी किंवा समाजनेत्यांनी धार्मिक किंवा सामाजिक आचारविचारांत देशकालवर्तमानाप्रमाणें जर उदारपणा धारण केला नाहीं तर नवजीवनाची तयार झालेली वाफ
संकुचित वृत्तीचे बॉयलर
पार फोडून टाकून धर्माच्या आणि समाजाच्याहि ठिकऱ्या कशा उडविते, याचा कटु अनुभव हिंदुधर्माला क्रि. श. पू. ६ व्या शतकांतच आला. या वेळी लोकमतांत धर्म आणि मोक्ष यांविषयी मोठी चिकित्सापूर्ण खळबळ उडाली होती. पशुहत्या आणि यज्ञयाग यांतच धर्माचें स्वारस्य मानणाऱ्या प्रचलित ब्राह्मणी धर्माच्या आचरणानें खरा मोक्ष मिळणें शक्य आहे काय? या प्रश्नानें तत्कालीन लोकमतांत बरीच
क्षुब्ध चर्चेची वावटळ
सुरू झाली.
मगध देश आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशावर हिंदुधर्माचा बसावा तितका पगडा बसला नव्हता. पूर्व वहिवाटीप्रमाणे हिंदुधर्मप्रचारकांनी या प्रदेशांतील लोक हिंदु केलेले नव्हते; म्हणून तेथील रहिवाशांत एकजिनसीपणा आलेला नव्हता. अर्थात या वावटळीचा मुख्य जोर याच प्रांतात विशेष चालू झाला. ब्राह्मणांच्या मगरुरीमुळें आणि आत्मस्तोमामुळें चिडून गेलेला सुशिक्षित राज्यकर्ता क्षत्रियवर्ग विद्वत्तेच्या आणि कर्तबगारीच्या जोरावर स्वतःला ब्राह्मणांपेक्षा अधिक ज्ञानी समजून त्यांचा धार्मिक अधिकार जुमानिनासा झाला. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामधील या स्पर्धेने तत्त्वज्ञानाच्या आणि धर्माच्या बाबतींत द्विधामतांचा प्रादुर्भाव झाला. ब्राह्मणवर्ग स्वतःस मोक्षाचा अधिकारी समजून धार्मिक बाबतींत कोणीहि हात घालू नये, यज्ञयागादि क्रिया आणि त्यांत होणारी अखंड पशुहत्या हाच एक खरा मोक्षाचा मार्ग आहे. असा हट्ट धरून बसला. नवविचारांच्या उसळूं पहाणाऱ्या लाटांची त्याने पर्वा केली नाही. समाजात नवजीवनाचें चैतन्य उद्भुत झालें, त्यालाहि त्यानें जुमानले नाही. उलटपक्षी क्षत्रिय वर्गांतील सुशिक्षित विचारी मंडळीना ब्राह्मणांचा हा परंपरेच्या अभिमानाचा हट्ट मुळींच मानवेना आणि आमच्या
मोक्षाचा किल्ल्या ब्राह्मणांच्या हातीं
काय म्हणून आणि पारमार्थिक उच्च ज्ञानाचा खजिना यांच्याच हातीं कसा? आमच्या उद्धाराच्या वाटेवर हे अडत्ये कां असावे? आमचा उद्धार आम्हीच करणार. अशा नवविचारी क्षत्रियांनी ब्राह्मणांच्या अत्याचारी यज्ञयागादि प्रघाताविरुद्ध उघडउघड बंड करण्याची तयारी केली. ईश्वर आत्मा, ईश्वराचा मनुष्याशीं संबंध आणि मुक्तीचा खरा मार्ग, यांबद्दल सर्वत्र कडाक्याचे वादविवाद सुरू झाले आणि जिकडेतिकडे
परस्पर-विरोधी मतांचा सुळसुळाट
झाला. ब्राह्मणी धर्मातील फाजील कर्मठपणा लोकांना अमान्य झाला आणि यज्ञाच्या निमित्ताने होणाऱ्या पशुहत्त्येच्या अमानुष रक्तस्त्रावानें जनतेला किळस उत्पन्न झाली. याज्ञिक अत्याचाराने मनुष्याला मोक्ष मिळतो, या ब्राह्मणी धर्मकल्पनेच्या परंपरेवर लोकांनी विश्वास ठेवण्याचें साफ नाकारलें. मोक्षाचा खरा मार्ग शोधून काढण्याची जनतेची मुमुक्षु वृत्ति तीव्रतम झाली. नाना मतांचा गलबला सुरू झाला. कोणी वैदिकधर्माच्या मूळ सनातन तत्त्वज्ञानाच्या अगम्य डोहांत बुडी मारून त्याचा ठाव पहाण्यासाठी कासा कसल्या; कोणी `नेति नेति` ह्मणूं लागले; तर कोणी देहदमन करून योगसाधनानें आत्म्याची मुक्ति करून दाखवितों म्हणून शंख फुंकले. या वेळीं भूतदया, आत्मसंशोधन आणि
एको देवः सर्वभूतेषु गूढ
सर्वव्यापी सर्व भूतांतरात्मा ||
या सनातन तत्त्वाच्या जाणिवेवर नवीन विचाराचा ओघ वहात होता. अखेर अनेक मतमतांरांतून
अहिंसा परमो धर्मः
या नवीन तत्वाचा पुकारा करीत बौद्ध आणि जैन धर्मपंथ पुढें सरसावले आणि ब्राह्मणी धर्माच्या हट्टवादी संकुचितपणाचा पुरा फायदा घेऊन त्यांनी वैदिक सनातन धर्मावर जबरदस्त शह लावला. तरीसुद्धां ब्राह्मणवर्गानें माघार घेऊन, हें तुमचें अहिंसेचे तत्त्व नवीन नाहीं, त्याचीही या वैदिक सनातन धर्मात मान्यता आहे, तुम्हांला याज्ञिकी कर्म हा अत्याचार वाटत असेल तर आम्हीं तो सोडून देतों, उपनिषदे आणि आठशे ("कौरवपांडवांचे भारती युद्ध इ.स.पू. ५४०० व्या वर्षी झाले असें विद्वानांनी आता ठरवीलें आहे. अर्थात् श्रीकृष्णानीं भागवतधर्म क्रिस्तापूर्वी निदान १४०० वर्षे म्हणजे बुद्धापूर्वी ८०० वर्षे प्रवृत्त केला असावा हे उघडच आहे.
येथे एक कटुतम ऐतिहासिक सत्य नमूद करण्याचा आमच्यावर प्रसंग आला आहे. वास्तविक पाहिलें तर मनाचा उदारपणा ब्राह्मणांनी आजपर्यंत कोठेंहि कधीहि दाखविलेला आढळत नाही. संकुचित वृत्ति हेंच त्यांचे ब्रीद, उदार वृत्ति आणि मनाचा मोकळेपणा हा क्षत्रियांचाच मनोधर्म, उपनिषदें गीता वगैरे क्षत्रियांनी केलेले ग्रंथ पहा, किंवा त्यांनी स्थापन केलेले ग्रंथ पहा, त्यांत ब्राह्मणी संकुचित वृत्तीचा लवलेशहि सांपडायचा नाही. म्हणूनच त्यांच्या ग्रंथांनी व पंथांनी साऱ्या भूगोलाता विंळखा घातला. या मुद्द्यावर सप्रमाण पुरावे देऊन पुष्कळ लिहिता येईल; परंतु एवढे म्हणणे सध्यां पुरें कीं ज्या ज्या कार्यात सोवळा संकुचितपणा दृष्टीस पडतो, त्या कार्याच्या मुळांशी ब्राह्मणी मनोवृत्ति असलीच पाहिजे, असा ठोकळ सिद्धांत करायला कांही हरकत नाहीं. मग त्या कार्याचा कर्ता सध्यांच्या जातींच्या प्रदर्शनांत क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र यांपैकी कोणत्याही लेबलाचा हक्कदार असो. अत्यंत व्यापक आणि साऱ्या विश्वालाहि कंवटाळणारी अशी जी `ब्रह्मविद्या` जी आमच्या हिंदु धर्माचा मूळ पाया, ती ब्रह्मविद्या मूळची क्षत्रियांची. त्यांनीच ती शोधून काढली आणि त्यांनी ती मागाहून ब्राह्मणांस शिकविली. (सध्यांचे क्षत्रिय व ब्राह्मण हे याच क्षत्रिय ब्राह्मणांचे वंशज असोत वा नसोत, तो प्रश्न अलाहिदा आहे.) बृहदारण्यकोपनिषद अ. ६ ब्रा. २ क्रं. ८ मध्ये क्षत्रिय नृपति श्वेतकेतू ब्राह्मण गौतमास म्हणतो "यथेंय विद्यात्वया प्रार्थितेतस्त्वत्सप्रदानापूर्व प्राङ्न कस्मिन्नपि" ब्राह्मण उवासोषितवती तथा त्वमपि जानीषे सर्वदा क्षत्रियपरंपरेयं विद्यागता`` `तू मागितलेली ही विद्या (ब्रह्मविद्या) तुला देण्यापूर्वी कोणत्याहि ब्राह्मणांमध्ये राहात नव्हती, कोणत्याहि ब्राह्मणांपाशी ही नव्हती, हें तुलाहि माहीत आहे. `ही विद्या सर्वदा क्षत्रियपरंपरेनें आलेली आहे.` छान्दोग्योपनिषद् अ. ५) वर्षांपूर्वी भगवान् श्रीकृष्णानें प्रतिपादलेली गीता यात परमेश्वराच्या शुद्ध स्वरूपावहनाचा सांगितलेला मार्ग चला तुम्ही आम्ही आतांपासून चालू लागूं पण निराळाच आणखी एक धर्मपंथ काढून तुम्ही वैदिक धर्मानुयायांच्या संघातून कां फुटून जाता? असें या नवमतवाद्यांना सांगण्याइतका मनोवृत्तीचा उदारपणा *(ख. ३-७ मध्ये जैवली राजानें गौतमाला पुन्हा हेंच सांगितले आहे, "तथा मा त्वं गौतमायदो यथेंयं न प्राक् परा विद्या ब्राह्मणान् गच्छति तस्मादु सर्वेषु लोकेषु क्षत्रस्यैव प्रशासनमभूदिति" ज्या प्रकाराने ही विद्या तुझ्यापूर्वी ब्राह्मणांकडे गेलेली नाही. ब्राम्हणांनी या विद्येनें अनुशासन केलें नाहीं, तो प्रकार प्रसिद्ध आहे. ही विद्या ज्या अर्थी पूर्वी ब्राह्मण संप्रदायांत नव्हती हें प्रसिद्ध आहे, त्याअर्थी पूर्वी सर्व लोकांमध्ये क्षत्रिय जातीचेच या विद्येनें प्रशासन होत होतें. शिष्यांना ही ब्रह्मविद्या क्षत्रियच शिकवित असत. ही विद्या या वेळेपर्यंत क्षत्रियपरंपरेनेंच आलेली आहे. `यावरून ब्रह्मविद्या सर्व जगताला शिकविण्याच्या अधिकार उदारधी क्षत्रियांचाच होय, संकुचित वृत्तीच्या ब्राह्मणांचा नव्हें, हें स्पष्ट होत आहे. गौतमबुद्ध, अशोक, महावीर, महंमद पैंगबर, येशूक्रिस्त, सॉक्रेटीस, तुकाराम, बंगालचा चैतन्य, नानक, गुरूगोविंदसिंग, दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद यांची उदात्त आणि विश्वव्यापी धर्मप्रसाराची कामगिरी पहा आणि इतर दशग्रंथी शतग्रंथी वेदोनारायणांची कूपमंडुकवृत्ति पहा, म्हणजे आमच्या विधानांची सत्यता पटेल, फार दूर कशाला? सध्यांहि हिंदुधर्म सुधारणेचा-पुनर्घटनेचा-प्रश्न निघाला आहे ना? पटेल बील पास झालें तर मी अन्नपाणी वर्ज करून प्राण देईन म्हणून आमचे एक पदच्युत शंकराचार्य कुर्तकोटी बरळत आहेत. ते निःसंशय ब्राह्मणवर्णाचे असले पाहिजेत. त्याशिवाय असली अनुदार कल्पना त्यांच्या अंतःकरणांतून प्रसवलीच नसती. ज्यांना `जगद्गुरू` पदवीच्या व्यापक अर्थाची व भावनेची जाणीवच नाहीं, त्यांनी उद्या प्रत्यक्ष ब्रम्हपुत्रा नदीवर जरी `विश्वधर्मपीठ` स्थापन करून स्वतःस `विश्वधर्मगुरू` म्हणविलें, तरी कूपमंकडूक ते कूपमंडूक! `विश्वची माझें घर` ही कल्पना त्यांना भासमान होणेंच आधीं कठीण!) ब्राह्मणांनी दाखविला नाहीं.
त्याचा परिणाम काय झाला तो इतिहासांत नमूद आहेच. बुद्ध धर्माने सर्व भरतखंड व्यापून सनातन वैदिक धर्माचा पाडाव केला आणि त्याची संघशक्ती खिळखिळी केली. हा प्रकार होण्यापूर्वी सुमारे एक शतक वर्गभेदाच्या तीव्रतेच्या आणि ब्राह्मणांच्या याज्ञिकी अत्याचाराचा तिटकारा येऊन, मानवी भेदाभेदाचा नायनाट करणारा व
भरणी आली मुक्त पेठा, करा लाटा व्यापार;
उधार व्यारे उधार घ्यारे, अवधे यारे जातीचे;
येथें पंक्तिभेद नाहीं, मोठे कांही लहान;
तुका म्हणे लाभ घ्यावा, मुद्दल भावा जतन.
या विश्वबंधुत्वाच्या तत्त्वाचा सक्रीय पुकारा करणारा भक्तिपंथ अस्तित्त्वांत आलाच होता. इतकें ताजें उदाहरण डोळ्यांपुढे असूनसुद्धां ब्राह्मणांनी आपल्या परंपरेच्या कोत्या अभिमानानें नवजीवनाच्या आकांक्षांना कस्सून विरोध केला. भक्तिपंथाचा प्रसार जारीनें झाला, त्यानें यवनादिकांनासुदां आपल्या संघांत घेतले आणि `रिता नाहीं कोणी ठाव, सर्वां भूतीं वासुदेव` या व्यापक सिद्धांताच्या अनुयायांचा एक निराळाच मोठा संघ बनविला. अशा रीतींने अनेक पंथ व अनेक संघ निर्माण झाल्यामुळें एकदेशीयत्त्व व एकधर्मीयत्व यांचा ऱ्हास होत गेला. दाही दिशांकडून येणाऱ्या अनेक निरनिराळ्या मानववंशांतल्या लोकांना
सनातन वैदिक धर्माची दीक्षा
घेऊन त्यांना आपल्या संघात घेऊन आपली सामाजिक शक्ती बळकट करण्याची प्राचींन धोरणी दृष्टी ब्राह्मणी धर्माच्या संकुचित वृत्तीनें फुटली आणि अखेर यामुळें हिंदु राष्ट्राचा राष्ट्रीय जोम दिवसेंदिवस अधिकाधिक खच्ची होत गेला. समाजांत उत्पन्न होणाऱ्या नवजीवनाला जुन्यापुराण्या परंपरेच्या फाजील अभिमानाच्या टोपलीखालीं दडपून ठार मारण्याच्या कोत्या अदूर दृष्टीचे पर्यवसान उत्क्रांती (Evolution)च्या ऐवजी क्रांती (Revolution)मध्यें कसें होतें, याचें स्पष्ट चित्र ब्राह्मणी धर्माच्या इतिहासांतच सांपडेल. प्रत्येक युगालाच नव्हे; तर प्रत्येक दहा दहा वर्षांच्या दशकाला आचार व विचार-क्रांती होत असते. सामाजिक जिवंतपणाचें हेंच खरे लक्षण आहे. रूढीच्या गंजलेल्या जुनाट फुटक्या कढईंत संकुचित वृत्तीच्या घाणेरड्या तेलांत, प्रतिगामी परंपरेचा मीठमसाला घालून,
पुनर्घटनेची भजीं कडबोळीं
तळून नवजीवनाची भूक शमविण्याचा वृथा यत्न करणें किती हास्यास्पद होतें, हें आचाऱ्यांनी किंवा आचार्यांनी नीट लक्षांत घ्यावें. नवजीवनाचा उद्देश, आकांक्षा व व्याप्ति याचा तिळमात्रहि विचार न करतां, जुन्या मतांचीच दमधाटीनें समाजावर जबरदस्ती करणाऱ्यांच्या अखेर चिंधड्या उडविल्याशिवाय समाज राहत नाहीं; मग हे प्राणी जगद्गुरु असोत, नाहीतर प्रत्यक्ष राष्ट्राच्या असोत, त्यांची पर्वा नवजीवनशक्ति कधींच करीत नाहीं. उलट समाजाच्या किंवा राष्ट्राच्या नवजीवनशक्तीचा आगाऊच आखाडा बांधून, तिला उत्तेजक व सहायभूत अशा नवीन तडजोडीची व्यवस्था करण्यासाठी तयार व्हा, म्हणून जो कोणी आधींच सूचना देतो, नवशक्तीच्या स्वागतासाठी जनतेची मनोभूमि तयार करण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न करतो, आणि येणाऱ्या नवशक्तीच्या तीव्र सोंसाट्यानें `रेव्होल्यूशन` होऊ न देता, त्या सोंसाट्याला मोठ्या चतुराईच्या मार्गाने `एव्होल्यूशन`कडे शांतपणे बिनतक्रार वाहूं देतो, तोच खरा ज्ञाता आणि तोच खरा जगद्गुरू! बाकीचे सारे ज्ञाते म्हणजे घटपटादि खटपटीचा उकीरडा फुंकणारे नामधारी पंडित आणि जगद्गुरू म्हणजे काषायवस्त्र परिधान करून मन मुंडण्याऐवजीं नुसते मस्तक मुंडण करणारे ऐदी संन्याशी!!
लो. टिळकांनी गीतारहस्य कां लिहिलें?
त्यांनी संन्यासयोगाचा धिक्कार करून कर्मयोगाचीच तुतारी अत्यंत आवेशाने कां फुंकली? असें करण्यांत त्यांना नवजीवनाच्या आगमनाची कांही प्रेरणा झालेली असेल काय? नव्या मन्वंतराच्या नवीन आकांक्षांच्या स्वागताचा त्यात काही नवीन संदेश सांगितला आहे काय?
या गोष्टींचा तिळमात्र विचार न करीतां रहस्याचें पुस्तक बाहेर पडतें न पड़तें तो केवळ एका आठवड्याच्या आंतच टिळकांच्या खुषमसकऱ्या अंधभक्तांचा, वावदूक एडीटर चित्रगुप्तांचा आणि गोमूत्रा इतकीच आपली विद्वता पवित्र समजणाऱ्या सांप्रदायी वेदोनारायणांचा जो
जोडाजोडीचा बीभत्स शिमगा
उडाला, तो पाहिला. म्हणजे परंपरेच्या संकुचित भावनेपुढे कसल्याही नवविचाराची दिक्कत न बाळगिण्या इतक्या अदूरदर्शी क्षुद्र विचारांचे शूद्र अझूनही आमच्यांत आहेत, एवढेच सिद्ध होते. ज्ञानोत्तर संन्यांस कीं कर्म या वादाचा निर्णय कांहीहि असो. एक मात्र मुद्दा वाचकांनी नीट ध्यानांत धरला पाहिजे की, संन्यासयोग सांगणारे श्रीशंकराचार्य प्रत्यक्ष संन्याशी होते आणि कर्मयोग सांगणारे टिळक प्रत्यक्ष कर्मयोगी होते; पण हे मधल्यामधी शुष्का-शुष्क वाद घालीत बसणारे गलबते ना संन्याशी ना कर्मयोगी! श्रीशंकराचार्यांनी ज्या काळी संन्यासयोग पुकारला त्या कालची देशपरिस्थितीच तशी असली पाहिजे; पण त्यांनी तो पुकांरला म्हणून यावच्चंद्रदिवाकरौ अक्षरशः जसाच्या तसा तो आजलाहि विसाव्या शतकांतील नवमन्वंतराच्या नवजीवनास उपयोगी पडेल, असें मानणें हें बुद्धिदौर्बल्याचे लक्षण नव्हे तर कशाचें? गौतमबुद्धाचा धर्म मूलतः निवृत्तीपर संन्यासमार्गाचा होता. त्याच्या अनुज्ञेप्रमाणें सर्वसंगपरित्याग करून त्याचे अनुयायी भिक्षु जंगलांत गेंड्याप्रमाणे भटकत होतेच; पण बुद्धाच्या निर्याणानंतर लवकरच (इ.स.पू. २०० वर्षे) खुद्द त्याच्याच अनुयायांत विचारक्रांती झाली. भिक्षु होऊन अरण्यांत एकलकोंड्या गेंड्याप्रमाणें उदासीन कालक्रमण करण्यापेक्षां धर्मप्रसारार्थ लोकहिताचीं व परोपकाराचीं कामे निष्काम `निरिस्सित` बुद्धीनें करण्यांतच बौद्धभिक्षुंच्या खऱ्या कर्तव्याची सार्थकता आहे. या नवीन
प्रवृत्तीमार्गाचा मिशनरीपणा
महायान पंथानें पुकारला. परंपरेच्या सांठवणीच्या गुळाच्या ठेवणीपलीकडे न पाहणारे जीर्णमतवादी `हिनयान` लोकांना तसेच निराळे कोकटत ठेवून या नवमतवादी महायान पंथाने मूळच्या बुद्धधर्मीय मूलतत्त्वास धक्का न लावतां, त्याच्या निवृत्तिपर स्वरूपावर कर्मप्रधान भक्तिमार्गाचें मिशनरी झबलें चढविलें आणि संघशक्तीच्या वृद्धीबरोबरच धर्माच्या प्रसारानें सारे जग व्यापून टाकले. नवजीवनाच्या चैतन्याचा पराक्रम हा असा असतो. शंकराचार्याच्या वेळी जनता ऐहिक संपत्तीनें मदोन्मत बनलेली होती. कनक कांता आणि मदिरा, ऊर्फ
WEALTH, WOMAN AND WINE
या `थ्री डब्ल्यू`मध्ये लोळण्यापलीकडे तिची प्रवृत्ती जाईच ना. अशा प्रसंगी समाजसुस्थितीची जबाबदारी ओळखणाऱ्या शंकराचार्यासारख्या लोकोत्तर महापुरुषानें संन्यासयोगाचें महत्त्व पुकारू नये तर काय नाटकयोगाचे पडदे उघडावे? त्यावेळी, देशकालनाप्रमाणे संन्यासपर निवृत्तिमार्गाचा वळसा जनतेच्या कल्याणासाठीं पाहिजे होता, तो शंकराचार्यांनी दिला. त्याचा योग्य तो परिणामही झाला. पण त्या वळशाचा या विसाव्या शतकांत काय उपयोग? व्यवहाराच्या हातांत हात घालून धर्म चालेल तरच त्याची खरी किंमत. नव्या मन्वंतराच्या प्रत्येक नव्या दर्शनाबरोबर धर्मानेही आपल्या पावलांची गति कमी अधिक केली पाहिजे. आजला हिंदुस्थानची स्थिती कशी आहे? शंकराचार्यांच्या वेळी ती जशी होती तशीच आज आहे काय? नाही तर मग शंकरचार्यांच्या संन्यासयोग आजलाही अक्षरश: पाळण्याबदलच हट्ट म्हणजे
सांप्रदायीक आग्रहीपणा
नव्हे तर काय? शिवाजीची भवानी तलवार १७ व्या शतकांत महापराक्रमी असेल, नव्हे होती, नाहीं कोण म्हणतो? पण या २० व्या शतकांतील टॉर्पेडो ड्रेडनॉटच्या धडाक्यात तिला पुसतो कोण? आणि उद्या एखादा शहाणा त्याच भवानीच्या सांप्रदायिक अभिमानाने तसलीच एक तलवार घेऊन रणांगणांत मिशांवर पीळ देत गेला, तर त्याची तेथे काय संभावणार होईल?
पूर्वी संन्यासयोगाशिवाय हिंदुंचा व हिंदुधर्माचा तरणोपायच नव्हता त्यावेळी नवजीवनानें संन्यासयोगांचा कर्णा फुंकला. आज नामशेष होऊ पहात असलेल्या हिंदुंच्या आणि त्यांच्या हिंदुधर्माच्या तोंडांत
कर्मयोगाचा हेमगर्भच
घातला पाहिजे. नव्या मन्वंतराचा `कर्म करा, कर्तव्य करा, कर्तबगार व्हा` हाच संदेश आहे. स्वामी विवेकानंदानी अमेरिकेस असा स्पष्ट जवाब दिला कीं, "बाई अमेरिके, तूं मोठी दयाळू आहेस, मायाळू आहेस, सर्व कांही आहेस, पण हिंदुस्थानांत तुझे क्रिस्ती मिशनरी पाठवून, तेथें दर माणसागणिक एकेक चर्च उभारण्याचा तुझा मतलब कांही माझ्या ध्यानांत नीटसा येत नाहीं. तूं काय हिंदुस्थानाला धर्मदान का करीत आहेस? आणि त्याच्याकरितां कां बये येवढे बोटी भरभरून मिशनरी आणि क्रोडो रुपये पाठवीत आहेत? हरहर! अग मेरू पर्वताला तोळाभर सोन्याची का कधी कोणी मदत करतात? हिंदुस्थानाला धर्म? आणि तो तूं पाठविणार? बये अमेरिके, हिंदुस्थानचा तुला खरोखर कांहीं फळवळा येत असेल, त्याच्याबद्दल तुझ्या शुभ्रांतःकरणांत जर सहानुभूतीचे खरेखुरे पीळ पडत असतील, तर हिंदुस्थानाला धर्म देण्याचा `अव्यापारेषु व्यापार` न करितां त्याच्या ओरडून ओरडून कोरड पडलेल्या
तोंडांत भाकरीचा तुकडा घाल
सर्व धर्मांचें माहेरघर अशा हिंदुस्थानाला धर्म देण्याचा उपक्रम करणें म्हणजे त्याचा अपमान करण्यासारखें आहे. "आज हिंदुस्थानाला भाकर पाहिजे आहे. आज हिंदुधर्माला उपासमारीनें उभेंसुद्धां राहवत नाहीं, त्याला प्रसारस्वातंत्र्याची कुबडी पाहिजें, हिंदु लोकांच्या संघशक्तीच्या खजिन्यांत आज टिपुसभरसुद्धा पाणी राहिलेलें नाहीं, त्या संघशक्तीचें प्रमाण वाढविलें पाहिजे. काठीला सोनें बांधून काशीपासून रामेश्वराला खुशाल जा, असें पुष्कळ म्हणतात; पण आजला हिंदुजवळ काठी किंवा सोनें दोन्हीही उरलेली नाहीत. हिंदुची श्रीमंती आज त्यांच्या कोरड्या बढायांत उरलेलीं आहे. असल्या कंगाल लोकांनी कसल्या लढाया मारणें शक्य आहे? आजला हिंदु लोक हे शब्दश: खरेखुरे संन्याशीच बनलेले आहेत, त्यांना आणखी संन्यासयोगाची काय जरूर? अन्नासाठीं मोताद झालेल्या, ढुंगण झाकण्यापुरत्या चिंध्यासाठींही पश्चिमेच्या सूर्याला विनंतीचे अर्ध्य देत बसलेल्या आणि भिक्षांदेहीशिवाय दुसऱ्या कसल्याही ईश्वराची भक्ति न करणाऱ्या हिंदुस्थानाला अधिक संन्याशीपणा कोणता शंकराचार्य देऊ शकेल? भणंग भिकाऱ्याला तूं संन्याशी हो, असें आग्रहानें सांगणाऱ्या शहाण्याची काय तारीफ करावी! आजला हिंदुलोक आणि त्यांचा हिंदुधर्म यांची स्थिती ही अशी पूर्ण संन्याशी आहे. परंतु ती कशी प्राप्त झाली हें पाहण्याचें आपलें मुख्य काम आहे. म्हणून आपण आता
इस्लाम आणि हिंदु धर्माची टक्कर
कशी लागली ते पाहूं, हिंदु धर्मप्रवर्तकांनी सनातन हिंदु धर्माचीं उदार आणि व्यापक तत्त्वें संकुचित केल्यामुळें मूळधर्मातून अनेक संघ व पंथ फुटून वेगळे कसे निघाले हें वर सांगितलेंच. शुद्ध व्यावहारीक वर्णव्यवस्थेचें असंख्य जातींत पर्यवसान होऊन एकीची बेकी झाली. प्रांतवारीनें अलग राहण्याची प्रवृत्ती वाढली. दक्षिण हिंदुस्थान व उत्तर हिंदुस्थान असा आत्मघातकी मायावी देशभेद उत्पन्न करून मध्यें नर्मदा नदीची कांटेरी कुंपण जाहीर केली.क्षत्रिय व ब्राह्मण एकमेकांचे हाडवैरी बनल्यामुळे, वैश्यांनीही आपल्या तागडी पलीकडे पाहण्याचें नाकारलें. शुद्रांची कोणी पर्वा न केल्यामुळे त्यांच्यांत उत्पन्न झालेलें आत्मोन्नतीचें नवीन जीवन हिंदु धर्माच्या कांटेरी पिंजऱ्यांतून मोकळे होण्यासाठी धडपडू लागले.
थोडक्यांत सांगायचे म्हणजे हिंदुधर्माने जगातील सर्व मानव वंशांतील लोकांना `या हो या` अशी प्रेमाची हांक मारून आपल्यांत समाविष्ट करून घेण्याची प्राचीन उदार परंपरा सोडून दिली आणि `गेलास तर जा, पुनः तोंड दाखवूं नकोस`, अशी उर्मट बेपर्वाई सुरू केली. अर्थात् अशा विस्कळीत फाटाफुटीचा फायदा घेऊन परकीयांनी आमच्या सर्वस्वाच्या पायांत
गुलामगिरीच्या अभेद्य शृंखला
ठोकल्या, त्यांत आश्चर्य तें काय? मुसलमानी रियासतीच्या पूर्वार्धाचा नीट अभ्यास केला आणि एका हातांत तलवार व दुसऱ्या हातांत कुराण घेऊन मुसलमानांनी आपल्या धर्मप्रसारार्थ जीं जीं साहसी व दूरदृष्टीचीं धोरणे लढविली त्याचा विचार केला, म्हणजे त्यांनी हिंदुस्थान, हिंदुलोक आणि त्यांचा हिंदुधर्म ही पादाक्रांत केली नसतीं तरच मोठे आश्चर्य झाले असते खरें! कोणत्याहि महत्कार्याची-विशेषतः धर्मप्रसार आणि राष्ट्रप्रसार यांची-सिद्धि अनुयायाच्या संख्येवर अवलंबून असते. ही संघशक्ती वाढवून अगदी नवख्या व परक्या देशांत जाऊन छातिठोकपणाने साम्राज्य स्थापन कसें करावें, या बाबतीत जगद्गुरू म्हणून
इस्लामाच्याच पायांवर डोकें
ठेवणे वाजवी होईल. हिंदुस्थानांत आलेल्या मूठभर इस्लाम धर्मप्रसारक मंडळींनी अत्यंत अल्पावकाशांत सारें हिंदुस्थान आपल्या अनुयायांनी गजबजून कसें सोडिलें, याचा इतिहास म्हणजे तत्कालीन हिंदुंचा धार्मिक, सामाजिक आणि राजकीय खिळखिळा इतिहासच होय. हिंदुधर्माच्या अनुदार आचारविचारांना कंटाळलेल्या आणि शूद्रत्वाच्या काल्पनिक मायावी बंधनात शेकडो वर्षे खंगत कुझत पडलेल्या लोकांना मुसलमानीं धर्मानें आपले दरवाजे खडाखड उघडून आंत घेतले आणि आपल्या अनुयायांची संख्या वाढविली. अर्थात हिंदुधर्मानुयायांची तितकी संख्या कमी होऊन त्यांच्या संघशक्तीचा ऱ्हास हाच इस्लाम धर्माचा उदय होण्यास मुख्यत्वेंकरून कारण झाला, हें निराळे सांगण्याची आवश्यकता नाहीं. महंमद गजनीनें हिंदुस्थानावर ज्या जगविख्यात बारा स्वाऱ्या केल्या. त्या करण्यापूर्वी रजपुतांच्या भीमपराक्रमाच्या आख्यायिकांनीं तो दबकला नाही. त्यानें हिंदुस्थानाबद्दल जी माहिती मिळविली, त्यांतील `आपसांतील फूट` या कलमावर त्यानें आपल्या भावी सिद्धीची खूणगाठ बांधली. रजपूत लोक महापराक्रमी खरे, परंतु त्याच्यांत
व्यावहारीक चातुर्याचा अभाव
फार होता. जशास तसे वर्तन करून आलेल्या संकटाचा फडशा पाडण्यांत लागणारे व्यवहारचातुर्य रजपुतांत मुळींच नव्हतें. भोळसर आणि शुद्ध धार्मिक (?) कल्पनांचे से गुलाम बनलेले होते. एकीच्या महत्त्वाला ते अज्जीबात पारखे झालेले होते. स्त्रियांच्या अब्रूसाठींच काय तीं युद्धे करायची, यापलीकडे दृष्टी न गेल्यामुळे जोहारासारखे अमानुष आणि नामर्दपणाचे प्रकार करण्यांत ते धन्यता मानू लागले. अविचार, विलासमग्नता आणि उन्मतपणा या दुर्गुणांमुळे आपापसांतहि युद्धे करण्यास ते मागेंपुढे पहात नसत. अर्थात त्यांच्या सर्व इतिहासप्रसिद्ध शौर्यधैयादि सद्गुणांची माती होऊन, शूद्र लोकांच्या कपटांचा त्यांच्यावर बिनतोड शह लागला आणि ते आपल्या सर्वस्वाला मुकले. अशा विस्कळीत परिस्थितीत इस्लामधर्माचा चांद तारा राज्यप्रसाराबरोबर धर्मप्रचार आणि धर्मप्रसाराबरोबरच राज्यप्रसार करण्यासाठीं हातात नागवी तलवार घेऊन जेव्हां हिंदुस्थानांत येऊन धडकला, तेव्हां त्यांच्या लढाईच्या शिस्तीपुढें बेशिस्त रजपूतादि क्षत्रिय फिके पडले.पैशाच्या लोभानें मुसलमान शत्रूंस अंतस्थ बातमी पोहचविणाऱ्या राष्ट्रद्रोही लोकांचा सुळसुळाट उडाला. जातिभेदाच्या तीव्रतेमुळे लढाईला तोंड देण्याची जबाबदारी एकट्या क्षत्रियांवर पडली. `देशाचें कांही कां होईना, आपला बचाव झाला म्हणजे पुरे` या शूद्र आणि नीच भावनेनें ब्राह्मणांनी
दोन्ही कानांवर हात
ठेवले. वैश्यांनी द्रव्यार्जनाची कास सोडली नाहीं हें खरें, पण त्या धनसंचयाचा अल्पांशसुद्धा त्यांनी राष्ट्रकार्यास दिला नाहीं. बिचारा शेतकरी आणि कामगार वर्ग तर इतक्या निकृष्टावस्थेला पोंचला होता की तो ब्राह्मणांस आणि क्षत्रियांस वैऱ्यासमान मानीत असे आणि त्यांच्या जाचणुकींतून आपली सुटका कधी होईल याची वाटच पहात बसला होता.
शूद्रांस तर मुसलमानांच्या आगमनानें अत्यानंद झाला आणि ते भराभर मुसलमान धर्माची दीक्षा घेऊन मुसलमान बनले. इस्लामी आरबांनी सिंध प्रांतांत हिंदुंवर केलेल्या अमानुष अत्याचाराची जाणीव हिंदु जनतेला किंवा हिंदुराज्यकर्त्यांना मुळींच नव्हती, अशांतला प्रश्न नाही. पण त्यांची सर्वच स्थिति इतकी विस्कळीत आणि बेजबाबदार झालेली होती कीं, हिंदु विराटपुरुषाच्या अंत:करणाला
भावी विनाशकाळाचे भेसूर चित्र
जरी पीळ पाडीत होतें, तरी पोट आणि अवयवांच्या आत्मघातकी तंट्याप्रमाणे त्याचे हातपायादि अवयव मुळीच हालचाल करू शकले नाहीत. याचा परिणाम हिंदुस्थानांतील ठिकठिकाणच्या निरनिराळ्या हिंदुराज्यांवर कसकसा झाला याचें चित्र रेंखाटण्यास येथे अवकाश नाहीं; कारण त्यामुळें सारा इतिहासच्या इतिहासच येथें पुनर्मुद्रित करण्यासारखे ते होईल. इस्लामानें तलवारीच्या तामसी जोरावर सात्विक हिंदुधर्माचा पाडाव करतांना हिंदुधर्मीयांची स्थिती कशी झाली आणि या भयंकर आपत्तीच्या दिव्यांतून हिंदुधर्म कसा पार पडला. एवढेंच आपणाला पहावयाचे आहे. मुसलमानांनी एतद्देशीय लोक बाटवून आपल्या इस्लाम धर्मांत समाविष्ट करण्याचा जो धूमधडाका सुरू केला त्याचा परिणाम हिंदुंतील खालच्या जातींवरच विशेष घडला; वरच्या वर्गांतील लोक फारसे बाटले नाहींत. परंतु हजारों वर्षे वरच्यांचे दास्य करकरून उठवणीस आलेल्या या खालच्या लोकांना मुसलमानी धर्म स्वीकारल्यामुळें आपल्या स्थितीत एकदम महदंतर पडल्याचे दिसून येतांच, हिंदुधर्माचे प्रेम त्यांनीं झुगारून दिले आणि त्याचा मोठा प्रचंड ओघ हिंदुधर्माच्या छावणीला अखेरचा रामराम ठोकून इस्लाम धर्माच्या संघशक्तीला अधिक समर्थ आणि पराक्रमी करण्याकरितां निघून गेला. स्वकीयांच्या दास्यांतून त्यांनी अशा प्रकारें आपली मुक्तता करून घेतांच, इस्लाम धर्मानें त्यांना एकदम मुसल्मान
राज्यकर्त्यांच्या बरोबरीचे जातभाई
बनविले. त्यांस ऐहिक ऐश्वर्याचा लाभ झाला. हजारों वर्षांचें त्यांचे नष्टचर्य संपले. त्यांच्या आंगच्या गुणांचा व पराक्रमाचा विकास होण्याची वाट त्यांना मोकळी झाली आणि त्यांचा नावलौकिक व मानमरातबही कल्पनातीत वाढला. एका वर्गास दुसऱ्या वर्गाने गुलामाप्रमाणे वागविल्यास राष्ट्रास केवढी भयंकर आपत्ति भोगावी लागते, याचा आमच्या आधुनिक स्पृश्यास्पृश्यत्वाचें सोंवळें ढोलकें बढविणाऱ्या धार्मिक डोंबाऱ्यांनी नीट विचार करावा. जोंपर्यंत हिंदुधर्माच्या मानेला परचक्राचा फांस लागला नव्हता, तोपर्यंत नव्या जुन्या व्रतें उद्यापनांवर घृतकुल्या मधुकुल्या करणारे धर्मरक्षक ब्राह्मण यावेळी पोबारा करून पसार झाले. हिंदुधर्मसंरक्षणांविषयी आपले कांही कर्तव्य आहे, याची त्यांना जाणीवच उरली नाहीं. किंवा ती जाणीव ज्यांना होती त्यांना मदत करण्याचीहि त्यांना वासना होऊं नये, याला
उपाध्यायांचा राष्ट्रद्रोह
याशिवाय दुसरें कोणतें अन्वर्थक नांव देतां येईल? इराण देश मुसलमानांच्या ताब्यांत सहजासहजीं कां गेला, याचे निदान ठरवितांना इतिहासकारांनी हाच सिद्धांत काढला आहे. तेथे धंदेवाईक उपाध्यायवर्गाचे माहात्म्य फाजील वाढून खालचे सर्व लोक त्यांचे दास बनले होते. परमेश्वरी कृपेच्या, पारलौकिक मोक्षाच्या आणि ऐहिक सुखोपभोगाच्या किल्ल्यांचा जुडगा या वेदोनारायणांच्या हातांत आणि इतर लोकांच्या हातांत सत्तेची फुटकी कवडी, अशा स्थितीत इस्लाम धर्माचे इराणवर परचक्र येतांच, या परान्नपुष्ट उपाध्याय वर्गानें खालच्या लोकांस नशिबाच्या हवाली करून आपण सूंबाल्या केला.परंतु देशासाठी व धर्मासाठी परचक्राशी तोंड देणाऱ्या लोकांस मदत करून या आणीबाणीच्या प्रसंगी राष्ट्रसेवा करण्याचा उदात्त विचार त्यांना सुचलाहि नाहीं आणि मानवलाहि नाहीं.
अर्थात् दीन व निराश्रित झालेले कनिष्ठ वर्गाचे इराणी मुसल्मानांच्या तावडींत आयतेच सांपडले आणि स्वदेश व स्वधर्म संरक्षण करण्याचा कांहींच तरणोपाय न उरल्यामुळें इराणी लोकांनीं मुसलमानी धर्म स्वीकारून आपला फायदा करून घेतला. हिंदुस्थानांतहि थेट असाच प्रकार घडला. ज्या ज्या वेळीं ज्या ज्या राष्ट्रांत उपाध्यायांच्या धार्मिक कर्तव्याला धंद्याचे स्वरूप आले, त्या त्या वेळी त्या त्या राष्ट्राचा घातच झालेला आहे, हे विशेष लक्षांत ठेविलें पाहिजे. यावरून उपाध्याय आणि सुशिक्षित जनता यांच्यावर राष्ट्रसंरक्षणाची केवढी जबाबदारी असते याचा वाचकांनींच विचार करावा. आतां
बाटलेल्या हिंदुंनी काय केलें?
हे आपण पाहू. हिंदुस्थानातील बरेचसे मुसलमान पूर्वीचे हिंदुच होतें हें मागें सांगितलेंच आहे. अफगाण अंमलाच्या दोन-तीनशे वर्षांत कांही मुसल्मान बाहेरून इकडे आले, ते बहुतेक तुर्क पठाण हे होत. त्यांनी बहुतेक हिंदु बायकांशींच लग्नें लावलीं. त्याजपासून जी संतति झाली, तिचा हिंदुधर्माने अव्हेर केल्यामुळे, त्यांची आयतीच मुसलमानांत भर पडली, याशिवाय जुलमानें बाटविलेल्या हिंदुंची संख्या वेगळीच. अस्सल मुसलमानांपेक्षा हे बाटलेले मुसलमानच - मग ते जुलमानें वा आपखुषीनें बाटलेले असो - हिंदुस्थानास आणि हिंदुधर्मास जास्त जाचक झाले. एकदा परधर्मात गेल्यावर पूर्वधर्माचा पाडाव करण्यास लोकांस विशेष स्फुरण येत असतें. त्यास स्वकीयाचीं व्यंगें, त्यांची राहणी आणि त्यांच्या सर्वसाधारण बऱ्यावाईट समजुती या पूर्ण माहीत असल्यामुळें, त्या माहीतींचा लाभ साहजिकच त्यांनी आपल्या नवीन इस्लाम जातभाईस करून दिला. देवालयाचा नाश करून तेथील अपार संपत्तीचा अपहार करण्याच्या कामी मुसलमानांस या बाटलेल्या हिंदुंचाच जास्त उपयोग झाला. कोणती युक्ती केली असतां लढाईत हिंदुंचा पराभव होईल, हे या बाट्यांकडूनच मुसलमानांस कळत असे, लढाई चालूं असतां एकदम मध्येंच गाई आणून उभ्या करणें, गाईचें रक्त व मांस टाकून हिंदुचे तलाव व विहिरीं भ्रष्ट करणें, या युक्त्या या बाट्यांनींच मुसल्मानांस शिकविल्या, या बाट्यांत अनेक मोठमोठे लौकिकवान पुरुष निघाले, ते इतिहासांत प्रसिद्धच आहेत. (१) अल्लाउदीन खिलजीचा `कलिजा` मलिक काफूर हा मूळचा रजपूत; अल्लाउद्दीनांच्या राज्यवृद्धीची अर्धीअधिक कामगिरी यानेंच केली. (२) मुबारीक खिलजीचा हस्तक हसन, हा मूळचा गुजराथी, यानें आपल्या वीस हजार गुजराथी जातभाईंना मुसलमानी धर्मात खेंचून आणलें. इतिहासप्रसिद्ध मलीक खुस्रू म्हणतात तो हाच. (३) फिरोज तघलकचा वजीर मक्बुलखान, हा मूळ तैलंगणांतल्या एका उच्च कुळांतला हिंदु. (४) गुजराथेंत मुसलमानी राज्याचा पाया घालणारा मुजफरखान हा मूळचा हिंदु, पण हिंदुधर्माचा पक्का द्वेष्टा. त्यानें सोमनाथाच्या देवळाचे दगड मशिदीला लावले. (५) लोदी घराण्यांतील सुलतान शिकंदर मूळचा हिंदु. (६) अहंमदनगरची निजामशाही स्थापन करणारा निजामुल्मुल्क बहिरी व त्याचा मुलगा अहंमद निजामशहा हे दोघे बाप-लेक मूळचे अस्सल ब्राह्मण. यांचीं मूळ नावे अनुक्रमे भैरव भटजी व तिमाप्पा भैरजी अशी होती. (७) इमादशाहीचा संस्थापक फत्तेउल्ला इमादशहा हा मूळचा विजयनगरचा तैलंगी ब्राह्मण. (८) जहांगीरचा प्रख्यात सेनापति महाबतखान मूळचा हिंदु रजपूत; संगराजिताचा मुलगा. अशी अनेक नांवे सांगता येतील. याशिवाय हिंदु स्त्रियांच्या पोटी जन्माला आलेल्या अनेक थोर पुरुषांची नांवे इतिहासात सापडतात. फार काय, पण दिल्लीच्या तक्तावर बसलेल्या बहुतेक बादशहांच्या माता मूळच्या अस्सल हिंदुच होत्या. ग्यासुद्दीन तघ्लक, फिरोज तघ्लक, जहांगिर, शहाजहान, इस्माईल अदीलशहा या सर्व
लोकोत्तर पुरुषांच्या माता हिंदुच
होत्या. हा सर्व इतिहास पाहिला म्हणजे असें म्हणणें भाग पडतें कीं हिंदुस्थान मुसलमानांनी पादाक्रांत केलें नसून, व्यवहारचतुर इस्लाम धर्माच्या चांद ताऱ्यानें हिंदुंकडूनच हिंदुंना जिंकून आपलें साम्राज्य-वैभव वाढविलें.
परधर्मी किंवा परधर्मांत गेलेल्या लोकांस शुद्ध करून परत हिंदुधर्मांत आणण्याची योजना हिंदुधर्मानें अशा प्रसंगी पुनरुज्जीवित न केल्यामुळे हिंदु राष्ट्राचे किती अनिर्वचनीय नुकसान झालेले आहे, याचा विचारी सज्जनांनी मुद्दाम विचार करावा, त्याप्रमाणें हे वरील लोक हिंदु धर्मांत असतांना पराक्रमशून्य अशा अपसिद्ध स्थितीत कां पडले होते आणि ते नवीन इस्लाम धर्मांत जातांत त्यांना एवढा चेव येऊन त्यांनीं लोकोत्तर पराक्रम गाजवून मोठमोठ्या शाह्या कशा स्थापन केल्या? असें कां व्हावे? याचाहि आमच्या सज्जन वाचकांनी शांतपणे विचार करावा; म्हणजे हिंदुधर्माचीं अर्वाचीन व्यंगे काय काय आहेत आणि त्याचें मूळचें सर्वव्यापी, सर्वग्राही आणि उदार स्वरूप सध्यां कसें नष्ट झालें आहे, याचीं प्रमेयें त्यांची त्यांनाच उलगडली जातील. मुसलमानांच्या राज्यवृद्धीचें काम बऱ्याच प्रमाणावर बाटलेल्या हिंदुनींच केले, याचा आता पुनरुच्चार करायला नको. तथापि मुसलमानांना येथें भराभर जय मिळत गेला, त्यांच्या धर्माचा प्रसार उत्तरोत्तर अधिकाधिक होत गेला, याचा एतदेशीय
जनतेच्या मनावर चमत्कारीक परिणाम
झाला. पुष्कळ कर्तबगार हिंदुंस असें वाटूं लागलें कीं, मुसलमानी धर्मांतच अशी कांहींतरी विशेष अद्भूत जादू आहे. त्याशिवाय कालचा पाट्या वहाणारा शूद्र हिंदु आज एकदम तलवारबहाद्दर मुसलमान सुभेदार होईल कसा? आपला हिंदुधर्म हीन, कमजोर, नपुंसक म्हणूनच त्यातील लोकांच्या हातून मुसलमानांइतका पराक्रम होत नाही. या विलक्षण अज्ञानजन्य गैरसमजुतीचा परिणाम फार भयंकर झाला. हजारों हिंदुलोक आपण होऊन मुसलमानी धर्माच्या गोटांत गेले. नुसते आलतुफालतु लोक नव्हें तर (१) बंगालचा राजा जितमल; (२) कालीकोटचा सामुरी; (३) केरळदेशचा राजा (४) सिंधचे सुमेरवंशी जाम रजपूत; (५) बराणचा राजा हरदत्त आणि त्याचे दहाहजार अनुयायी; (६) काश्मीरच्या सेनदेव राजाची राणी (हिनें नवऱ्याचा खून करून सुलतान शम्सुद्दिनाशीं लग्न लावलें.) असलीं चांगलीं चांगलीं कर्तबगार मंडळीसुद्धा हिंदुधर्म सोडून गेली. हाय हाय! केवढा हा हिंदुंच्या संघशक्तीचा ऱ्हास!! खरोखरच का आमचा हिंदुधर्म इतका दुबळा आहे? ज्या धर्मानें श्रीकृष्णासारखा जगद्विख्यात मुत्सद्दी आणि धर्मप्रचारक सूर्य निर्माण केला, ज्या धर्मानें भीष्मासारखा अद्वितीय आणि अजिंक्य धर्मन्यायज्ञाता योद्धा इतिहासांत अजरामर केला; ज्या धर्मानें अभिमन्यूसारखे अनामिकेला सार्थवति करणारे तरुण जवानमर्द प्रसवून या भारतभूचें ऋण फेडलें; ज्या धर्मात कर्णासारख्या अकुलीन वीरानींहि कुलीनपणाची घमेंड मारणाऱ्यांना आपल्या पायावर डोकीं घासावयास लावलें; ज्या धर्मात धर्म, चंद्रगुप्त, अशोक यांसारखे महान पराक्रमी सम्राट निर्माण झाले; ज्या हिंदुधर्माच्या नुसत्या अभिमानाच्या ठिणगीनें माधवाचार्यासारख्या विरक्ताच्या हातूनहि विजयनगरासारख्या अनुपमेय साम्राज्याची स्थापना झाली; ज्या हिंदुधर्मानें शिवाजी महाराज निर्माण करून आपला शिणभार उतरला आणि
प्राण गेला तरी मुसलमान होणार नाहीं,
ह्मणून ठणठणीत रोकडा जबाब सत्ताधाऱ्यांच्या तोंडावर देणारा छत्रपति संभाजी ज्या हिंदुधर्माने इतिहासाला दाखविला; तो हिंदुधर्म खरोखरच काय हो नपुंसक म्हणावा? नाही. हिंदुधर्म नपुंसक नाही. हिंदुधर्म दुबळा नाहीं. हिंदुधर्म तुसडा नाही. हिंदुधर्म ("गीतेवर पुराणें सांगणारे व हल्ली विलायतेस इंग्रजी तरुणींना नाच शिकवीत असलेले कान्हेरेशास्त्री एकदां ठाकुरद्वारीं पुराण सांगतांना मोठ्या घमेंडीने म्हणाले, "आमचा हिंदु धर्म किनै मोठ्ठा उर्मट! तो कोणाची पर्वा करीत नाहीं. तो आधीं कोणा परक्याला अपल्यांत येऊं देत नाहीं. पण कोणीं मूर्खपणानें उठून बाहेर गेला तर त्यालासुद्धा पुन्हा आंत घेत नाहीं!" वा:! गीतेची पारायणे करून करून शास्त्रीबुवांनी केवढें पण हें रहस्य शोधून काढलें? अतां हिंदुधर्म उर्मट की शास्त्रीबुवा उर्मट? कोणीं तरी एक उर्मट असला पाहिजे खास.) उर्मट नाहीं. पण त्याच्या कमनशिबानें तो ज्यांच्या हातीं सांपडला, त्यांच्या तुसडेपणानें, उर्मटपणानें आणि कर्तव्यशून्यतेमुळेच तो गंजलेल्या शस्त्राप्रमाणें हतबल आणि बेकर्तबगार झाला.
भलभलत्या सामाजिक गोष्टींचाहि धर्माच्या शुद्ध साम्राज्यात बळजबरीचा प्रवेश झाल्यामुळें, खोट्यानाट्या भोळसर धर्मकल्पनांनी जनता अगदी बद्ध होऊन गेली. नानाप्रकारच्या कादंबरीवजा देवदेवतांचे महात्म्य वाढलें शकुनापशकुनांचे स्तोम माजलें आणि असंख्य जातींच्या संकुचित कुंपणांत स्वतःचा सवता सुभा करून राहणें म्हणजेच धर्म, असल्या राष्ट्रविनाशक भावनेमुळें हिंदुंचा, त्यांच्या राष्ट्राचा आणि धर्माचा घात झाला. अल्पसंख्य मुसल्मानांनी एवढ्या अवाढव्य हिंदुंची संघशक्ती कशी जमीनदोस्त केली, याबद्दल स्टॅन्ले लेन्पूल म्हणतात, "हिंदुंच्या (व्हिन्सेन्ट ए. स्मिथ म्हणतात :- "Caste, which lookes at broadly, unites all Hindus by differentiating them from the rest of mankind, disintegrates them by breaking them up into thousands of mutually exclusive and often hostile sections. It renders combined political or social action difficult, and in many cases impossible; while it shuts off all Hindus in large measure from sympathy with the numerous non-Hindu population. [Oxford-India, Intro.xi]) जातिभेदामुळे त्यांचा पाडाव झाला. मुसल्मानांकडे पाहिलें तर सर्वांचा उद्देश एक आचार एक, यथेच्छ आचाराची पूर्ण मुभा, निरर्थक सामाजिक बंधनांची अडचण नाही, सर्वजण बंधुत्वाच्या भावनेनें `मारीन किंवा मरेन` अशा दृढ निश्चयानें बाहेर पडलेले. अशा एकजुटीच्या लोकांपुढे आपसांत झगडणाऱ्या बेबंद लोकांचा निभाव कसा लागावा? रजपूत राजे व क्षत्रिय सरदार पिढीजात हाडवैरांनी जखडलेले. मानापमानांच्या वेडगळ कल्पनांनीं, मागचा पुढचा विचार न पाहता व ऐहिक स्वार्थावर नजर न देतां, वाटेल तसे वागणारे होते, त्यांच्या धर्माचा पाया जातीवर म्हणजे जन्मावर व कुलावर रचलेला होता. परकीयांस ते आपल्या धर्मांत घेत नाहींत, म्हणून दुसऱ्यांस आपल्या धर्मांत ओढून आणतांना उत्पन्न होणारें तीव्र वारे हिंदुंच्या ठिकाणी येणे शक्य नव्हतें... क्षात्रधर्माच्या व इभ्रतीच्या बड्याबड्या गप्पांचा व कल्पनांचा निभाव प्रत्यक्ष व्यवहारांत लागत नसतो. जातिभेदानें कामाची वाटणी झाल्यामुळे क्षत्रिय आपल्या कामात कचरू लागले, तर त्यांच्या मदतीस इतर जाती येत नसत. राज्याच्या भानगडी करण्याचें काम केवळ क्षत्रियांचे आहे, असे म्हणून ब्राह्मणादि इतर वर्ग स्वस्थ बसले... मुसलमानांचे ऐक्य त्यांचा उत्साह व प्रसंगानुसार वर्तन या बाबतीत हिंदु लोकांहून ते श्रेष्ठ होते; आणि व्यक्तिविषयक शौर्य जरी हिंदुंच्या ठिकाणी कामी नसलें, तरी हिंदुंचे जातिभेद, एकमेकांशी झगडणाऱ्या निरनिराळ्या सरदारांचे अंत:कलह, फूट पाडणाऱ्या वेडगळ धर्म समजुती, परधर्मी लोकांस आपल्या धर्मात ओढून आणण्याची मनाई, ह्या कारणांनी हिंदुस्थानांत राष्ट्रीय अभिमान कसा तो उत्पन्न झालाच नाही. मुसल्मानांचे साहस, लष्करी पेशा, धर्मत्वेष व राज्यलोभ यामुळें हिंदुंस ते वरचढ झाले; आणि योग्य पुढारी मिळाल्याबरोबर त्यांचा उत्कर्ष होत गेला." [सरदेसाई, मु. रियांसत ३८८-८९.] राष्ट्रीय वैभव वाढविण्यासाठी
लोकसंग्रहाची आवश्यकता
किती असते, याचें प्रतिपादन किंबहुना प्रत्यक्ष आचरण-हिंदुधर्माने कधींकाळी केलें असेल, नाहीं असें नाहीं; तथापि आमची श्रीमद् भगवद्गीता आज लोकसंग्रहाचा मंत्र गेलीं अडीच हजार वर्षे आमच्या कानीं कपाळी ओरडून सांगत आहे, एवढें खास. परंतु गीतेच्या काळानंतर हा मंत्र हिंदुधर्माने प्रत्यक्ष आचरणांत आणल्याचे मात्र इतिहासांत नमूद नाहीं. लोकसंग्रह केला बुद्धधर्मीयांनी व इस्लाम धर्मीयांनी, हिंदुंनी मात्र नुसता त्याचा मंत्र जपण्यापलीकडे कांही एक केलें नाहीं. "India offers unity in diversity" भेदांतच अभेद, हा इतिहासकारांचा शेरा तत्त्वतः खोटा नाहीं खरा, तथापि ब्राह्मणी वर्चस्वामुळें धर्माला जें एक प्रकारचें द्वाड संकुचित वळण लागलें आणि व्यावहारिक तत्त्वावर उभारलेल्या वर्णव्यवस्थेचा असंख्य जातींत जो विचका झाला. त्यामुळे व्यवहारचातुर्य व लोकसंग्रह या दोन गोष्टींत हिंदु लोक
कायमचे नालायक ठरले.
अल्बेरुनी नांवाच्या एका अत्यंन्त विद्वान् व निःपक्षपाती फिरस्त्याने सन १०४० च्या सुमारास हिंदु लोकांबद्दल जें काहीं लिहून ठेविले आहे ते आजला फार विचार करण्यासारखे आहे. अल्बेरुनी म्हणतो, "हिंदुंच्या स्वभावातील कित्येक ठळक गोष्टी उघडउघड दिसून येतात. मूर्खपणाला औषध नाहीं हेंच खरे. हिंदु लोकांना वाटतें, आपल्या राष्ट्रासारखें राष्ट्र नाही; आपल्या राजासारखे राजे नाहींत; आपल्या देशासारखा देश नाही; आपल्या धर्मासारखा धर्म नाहीं आणि आपल्या विद्येसारखी विद्या नाहीं. ते उद्दाम, गर्विष्ठ आणि मंद आहेत. आपली विद्या दुसऱ्यांस देण्यास ते अतिशय नाखुष असतात. परक्यांस तर काय, पण आपसांत सुद्धां एका जातीचा गृहस्थ आपली विद्या दुसऱ्या जातीस देत नाहीं. त्यांना वाटतें, सगळ्या पृथ्वीवर देश काय तो आपला एकच आहे, दुसरे देशच नाहींत; आणि आपल्या विद्या दुसऱ्या कोणास यावयाच्याहि नाहींत. मुसलमानांच्या देशांत एखादी विद्या आहे किंवा तिकडे कोणी विद्वान गृहस्थ आहेत असें सांगितले तर, तें त्यांस खरें सुद्धां वाटत नाहीं. ते जर प्रवास वगैरे करून दुसऱ्या लोकांशी मिसळतील तर त्यांचे अनेक मिथ्या ग्रह आपोआप दूर होतील. त्यांचे पूर्वज कसेहि असले तरी दुराग्रही व संकुचित मनाचे नव्हते. हिंदुस्थानात येऊन तेथील विद्या शिकून घेण्यास मला किती प्रयास पडले ते माझे मलाच ठाऊक! हिंदुंच्या सर्व विद्यांचा आज भयंकर गोंधळ झालेला आहे. कशास कांहीं ठिकाण नाही. उत्कृष्ट विद्या अज्ञानी व मूर्ख लोकांच्या हातीं पडून त्यांचे मातेरें झाल्यामुळे चांगलें कोणतें व वाईट कोणतें याचा उलगडाच करतां येत नाहीं. उत्कृष्ठ रत्नें उकिरड्यात मिसळून जावीं, तशांतला प्रकार झालेला आहे." [सरदेसाई मु. रि. ३९७] हा सर्व प्रकार पूर्वी कोणाला जाणवला नव्हता, किंवा तो नाहींसा करण्याकरितां कांहीं प्रयत्नच झाले नाहींत, असें मुळींच नाहीं. हिंदु धर्माचे कर्तबगार अभिमानी संत निष्काम वृत्तीनें लोकसंग्रहाच्या द्वारें धर्मसंरक्षणाचे थोडेफार काम हिंदुस्थानांत ठिकठिकाणी करीतच होते; आणि आजला जर हिंदुधर्म कांही बऱ्यावाईट स्थितींत जगला असेल तर त्यांचे सारे श्रेय या संतांना दिले पाहिजे. या संतांनी परिस्थित्यनुरूप आपापल्या प्रांतांत निरनिराळे धर्मपंथ स्थापून भूतदया, विश्वबंधुत्व व धर्मप्रेम या गोष्टी आपल्या प्रत्यक्ष वर्तनानें जिवंत ठेवण्याची मोठी स्पृहणीय कामगिरी बजाविली आहे. विशेषतः आमच्या महाराष्ट्रांतील पंढरपूरच्या विठ्ठल बादशाहीच्या साम्राज्य छत्राखालीं नानाविध जातींच्या संतांनी
वैष्णव धर्माचा झेंडा
उभारून जगाला हिंदुधर्माचें शुद्ध उदार स्वरूप पुनश्च झगझगित दाखविण्याची जी अनिर्वचनीय अशी बिनमोल कामगिरी केली आहे, तिचें वर्णन केवळ शाब्दिकांनी करण्याचा डौल मिरविणें हास्यास्पद आहे. या संतसंघाचे अध्वर्यू तुकाराम महाराज यांचा खालील जाहीरनामाच या संतांच्या कामगिरीची साक्ष पटवील. कांस घालोनी बळकट । झालों कळिकाळासी नीट केली पायवाट । भवसिंधू वरुनी ।।
यारे यारे लहान थोर । याति भलते नारिनर करावा विचार । नलगे चिंता कोणांस ।
... एकंदर शिका । पाठविला इहलोका । आलों म्हणे तुका । मी नामाचा धारक ।।
तथापि या संतांची ही कामगिरी सुद्धां जवळजवळ एकदेशीच झाली, असें म्हणायला हरकत नाहीं, परधर्मीयांनी लाथांखाली तुडविलेला हिंदुधर्माचा पलीता या सज्जनांनी झटदिशीं उचलून, त्यावर आपल्या भक्तीच्या स्नेहाचा पूर ओतून, त्याला पुनश्च प्रज्वलित केलें ही गोष्ट खरी; परंतु नसत्या धर्मप्रेमानें कांही जगाचा संसार चालत नाहीं. ज्या व्यावहारीक ज्ञानाच्या अभावामुळेच हिंदुंना आपले हिंदुत्व व सर्वस्व गमाविण्याचा प्रसंग आला, तो डाग धुऊन टाकून
हिंदुधर्माची व्यावहारीक कर्तबगारी
ठसठशीत सिद्ध करून दाखविण्याकरिता, धर्म आणि व्यवहार यांची बिनतोड सांगड घालून देणारे कट्टे कर्मयोगी समर्थ रामदास हे पुढें सरसावले.
त्यांच्या उपदेशाची व विचारांची दिशा अर्थातच इतर संतांहून भिन्न होती. सर्व समाजांस एकीच्या बंधनांनी निगडीत करून त्यांजकडून धर्मप्रसाराबरोबरच राष्ट्रकार्य करावें, हा समर्थांच्या उद्योगाचा मूळ पाया होय. सर्व कृत्ये श्रीरामाच्या नावानें करावी, राम सर्वांचे कल्याण करील, रामनामात विलक्षण शक्ति आहे, आणि
दृढनिश्चय हाथ परमेश्वर
या समर्थांच्या शिकवणीचा आगये तरुण `एज्यूकेटेड` महत्वाकांक्षी देशबांधव गूढार्थ उकलण्याचा यत्न करोत! कै. जस्टिस रानडे म्हणतात, "जसे गीता-रहस्य एका श्लोकांत सांगितले आहे. तसाच समर्थांचा उपदेश अर्ध्या ओवीत सांठविलेला आहे. ती अर्धी ओवी ही -
मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा !!
दहाव्या शतकापासून तों सतराव्या शतकापर्यंत झालेली हिंदुधर्माची पायमल्ली व हिंदुंच्या संघशक्तीचा ऱ्हास समर्थांना स्पष्ट दिसत होता. ब्राह्मणी मनोवृत्तीने धर्माच्या नाड्या कशा आखडून टाकल्या, हेंही त्यांना कळलेंले होतें, आणि त्यांनी ब्राह्मणांचे कान उपटायलाही कमी केले नाही.
राज्य नेलें म्लेंच्छक्षेत्रीं । गुरुत्व नेलें कुपात्रीं ।।
आपण अरत्रीं ना परत्रीं । कांहीच नाही ।।
ब्राह्मणांस ग्रामण्याने बुडविलें । विष्णूने श्रीवत्स मिरविलें ।।
त्याच विष्णूने शापिलें । परशुरामा ।।
आह्मींहि तेचि ब्राह्मण । दुःखे बोलिलों हें वचन ।।
वडील गेलें ग्रामणी करून । आम्हां भोवतें ।।
आतांच्या ब्राह्मणी काय केलें । अन्न मिळेलं ऐसे खाल्लें ।।
तुम्हा बहुतांचे प्रचीतीस आलें । किंवा नाही ।।
महाराष्ट्र धर्म वाढवा, महाराष्ट्र धर्माचा घेरा साऱ्या हिंदुस्थानाला पाडा, महाराष्ट्र धर्म महाराष्ट्रातच डांबून ठेवतां त्याचा सर्वत्र प्रसार करा. असा नुसता कोरडा उपदेश करूनच समर्थ स्वस्थ बसले नाहीत, तर भगवंताचें भक्तीसाठी थोर आटाआटी करण्यासाठी त्यांनी आपले एक
रामदासी सांप्रदायिक मिशन
प्रत्यक्ष काम करण्यासाठी निर्माण केले या, `मिशनचा मेसेज` आसेतु हिमाचल वातावरणांत थरथराट करू लागतांच श्रीमच्छत्रपति शिवाजी महाराज ही पुण्यश्लोक मूर्ति `धर्म संस्थापनेची कीर्ती` संभाळण्यासाठी आपली भवानी परजीत पुढें आली आणि समर्थ व शिवाजी या त्रैलोक्यवंद्य गुरुशिष्यांच्या जोडीने `कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकांस धाक सुटले, कित्येकांस आश्रय झाले` इतकेच नव्हे, तर त्यांनी `देव मस्तकी` धरून अवघा हल्लकल्लोळ केला, आणि `धर्मसंस्थापनेसाठी मुलूख बडवा` अतोनात वाढविला. समर्थांचे पट्टशिष्य श्रीशिवाजी महाराज यांच्या हिंदुधर्माबद्दलच्या कल्पना किती उदात्त आणि व्यापक होत्या, याचें प्रत्यंतर
बजाजी निंबाळकरांची शुद्धि
या एकच इतिहासप्रसिद्ध प्रसंगाने दाखविलें. सन १६४४ त शिरवळच्या लढाईत बजाजी निंबाळकर यांस विजापूरकरांनी कैद करून नेले. बजाजी म्हणजे त्या काळच्या मराठ्यांतील एक जाडें प्रस्थ होतें. असला मोहरा ठार मारण्याचा अदीलशहाचा हेतू माने, घाटगे वगैरे सरदारांनी मोठ्या शिकस्तीने टाळला. तेव्हा शहानें (या ठिकाणीं वाचकांना स्मरतच असेल कीं हा अदीलशहा खुद्द मूळचा हिंदुच होता. तेव्हां धर्मांतर करून गेलेल्या बाट्यांना आपल्या पूर्वाश्रमींच्या जातभाईंना आपल्याचप्रमाणे बटवून घेण्यांत किती चेव येतो, हे यावरून नीट समजेल.) अट घातली कीं, बजाजी मुसलमान होईल तर त्यास सोडून देऊन शिवाय मोठी जहागीरहि देतों. बजाजीच्या अस्सल हिंदु रक्तानें आतल्या आंत निषेधाचा मोठा चरफडाट केला; पण उपयोग काय? गेलीं चारशे वर्षे वाडवडिलांनी भोगलेली जहागीर जप्त झाली आणि निंबाळकर घराण्याचाहि उच्छेद होण्याचा प्रसंग आला. शेवटी देशकालाकडें लक्ष देऊन आपद्धर्म म्हणून
जीवावरचें शेंपटावर
घालविण्यासाठीच बजाजीनें मुसल्मानी धर्म स्वीकारला. शहाने आपली मुलगी देऊन त्याला जांवई केलें आणि पूर्वीची वाडवडिलार्जित व आणखी नवीन जहागीर देऊन बजाजीखानाचा इतमाम वाढविला.
निंबाळकरादि मराठे सरदार हें त्या वेळी अदिलशाहीचें आधारस्तंभच होतें. भोसल्यांच्या घराण्याशी निंबाळकरांचा ऋणानुबंध विशेष. तेव्हा निंबाळकराला मराठेसंबंधातून फोडून नातेवाईक मुसल्मान बनविल्यास आपली शक्ती वाढेल आणि शिवाजीला निंबाळकरांची मदत न झाल्यामुळे त्याची साहसें अर्थातच लंगडी पढतील, हा धोरणी विचार अदीलशहाने केला. एकादा मुनष्य मग तो कितीहि महत्त्वाचा असो-परधर्मांत गेला तर त्यांत कार्य झालें? काय आजपर्यंत हजारों लाखों हिंदुलोक मुसलमान किंवा क्रिस्ती झाले नाहीत? हें असें व्हायचेंच. मग एकटा बजाजी निंबाळकर मुसल्मान बनला तर त्यांत हिंदुंना इतके ऊर बडविण्याचें कारण काय? दररोज हजारों आपद्ग्रस्त अज्ञानी हिंदुबांधव व भगिनी क्रिस्ती धर्मांत जात असलेल्या पाहूनहि जर सध्याच्या विसाव्या शतकांतल्या बृहस्पतींच्या अंतःकरणास किंचितसुद्धां तिडीक येत नाहीं, तर `मुसल्मान होणें हींच भाग्योदयाची लक्षणे` अशी प्रवृत्ति बोकाळलेल्या सत्राव्या शतकांतल्या हिंदुंनी काय म्हणून हळहळावे? गेलास तर जा, काळे तोंड कर. असा धिक्कार करण्याची हिंदुधर्माची उर्मट प्रवृत्ति सर्वत्र प्रचलित होती. आजलाहि तीच स्थिती आहे. परंतु मराठा बजाजी निंबाळकर मुसलमान बजाजीखान झालेला पाहून
शिवाजीच्या हृदयाला पीळ पडले
सत्राव्या शतकांत स्वराज्यस्थापनेचा उपक्रम करणाऱ्या शिवाजीला लोकसंग्रहाची जाणीव जितकी भासत होती, तितकी विसाव्या शतकांत स्वराज्याच्या टिमक्या पिटणाऱ्या आणि लोकशिक्षणाची घमेंड मारणाऱ्या बोलघेवड्या नामधारी दे.भ.स. भासत असलेली खास दिसत नाहीं. निंबाळकरांचा आणि भोसल्यांचा पिढीजात संबंध. निंबाळकरामुळेंच भोसले उदयास आले. शिवाय बजाजीसारखे कर्तृत्ववान् तलवारबहाद्दर `वैरियाकडे मिळोन जाती` या परिस्थितीच्या वेदना शिवाजीसारख्या लोकसंग्रही धोरणी पुरुषास कशा जाचीत असतील, याची जाणीव
जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे!
एवढा मोठा बलिष्ठ सरदार मराठामंडळांतून फुटून आपल्या वैऱ्याच्या संघांत जाऊन पडल्यामुळे शिवाजीच्या नूतन साहसांत मोठेच विघ्न उपस्थित झालें. खुद्द बजाजीलाहि तें धर्मांतर वाटेना; आणि आपद्धर्म म्हणून केलेले धर्मांतर कोणाला पश्चात्तापाच्या होळीत होरपळून काढल्याशिवाय रहात असेल? आजलाहि असे तळमणारे असंख्य जीव साऱ्या हिंदुस्थानभर पसरलेले आहेत; परंतु त्यांच्या अंतःकरणाच्या किंकाळ्या ऐकणारा शिवाजी आणि दुःखाचें मूळ नाहीशी करणारी जिजाबाई आज कोठे आहे? सन १६५७ त बजाजी विजापुराहून स्वदेशीं परत आला, आणि त्यानें जिजाबाईची भेट घेऊन सर्व वृत्त निवेदन केले. हिंदुधर्मप्रतिपालक शिवाजी सचिंत मुद्रेने उभा आहे. शेजारींच पश्चात्तापाने होरपळलेला बजाजी खाली मान घालून खिन्न उभा आहे आणि समोरच हिंदुधर्माच्या भवितव्यतेचा अखेरचा निर्णय देणारी
न्यायदेवता माता जिजाबाई
आपल्या प्रेमळ नेत्रांनी त्या दोघांकडे पहात स्वस्थ बसल्या आहेत. आजपर्यंत या मायलेकांनी हिंदुधर्मसंरक्षणाचे निश्चय ठरविले; आज हिंदुधर्माच्या भवितव्यतेचा कायमचा निर्णय लावण्याचा प्रसंग आला. मोठी कसोटीची वेळ आली. आज न्यायदेवतेच्या तोंडून लागणारा निकाल गेल्या शेकडों वर्षांच्या रुढीचा उलटसुलट कांहींतरी सोक्षमोक्ष लावणार. हिंदुधर्म
जगावा की मरावा?
या बिकट प्रश्नाचा निर्णय आज माता जिजाई लावणार. आज या न्यायदेवतेचा न्याय हिंदुधर्माला एकदम फांसावर तरी लटकावणार किंवा मोठ्या सन्मानाने त्याला जगांतील अत्युच्च सिंहासनावर तरी बसविणार! आज गेली शेकडों वर्षे ज्या गोष्टीचा निर्णय लावण्याची बुद्धी स्वतःस धर्मसंरक्षक समजणाऱ्या ब्राह्मणांना झाली नाहीं, त्याच गोष्टीचा अखेर-निकाल आज ही क्षत्रिय न्यायदेवता लावणार! हिंदुधर्माच्या जीवन चरित्रांत आजच्यासारखा प्रसंग आजच आला. न्यायदेवतेचा न्याय ऐकण्यासाठी आज चराचरांनीहि मौन धारण केलें. वातावरणांतल्या लहरी मंदमंद लपतछपत वाहू लागल्या. सारें हिंदुस्थान आपला श्वास थांबवून न्याय ऐकण्यासाठी क्षणभर हातचे उद्योग खाली ठेवून उत्सुक होऊन बसले
अगम्यस्थलनिवासी हिंदुधर्माभिमानी महात्मे आपापल्या गिरिकंदरांतील गुहांचा त्याग करून सूक्ष्मरूपाने न्यायमंदिरांत येऊन दाखल झाले. उपनिषत्कार ऋषि महामुनी, भारतकार व्यास, जगद्गुरु श्रीकृष्ण भगवान् हेहि या हिंदुधर्माच्या
डे ऑफ जजमेंट
चा ऐतिहासिक प्रसंग पहाण्याकरितां गुपचुप तेथें येऊन बसले. न्यायदानाच्या गंभीर व शांत कार्यात व्यत्यय येईल म्हणून देहूस तुकोबा आपल्या अखंड भजनाचा टाळ बंद ठेवून हरिनामसंकीर्तनाचा अभंग छंदसुद्धा भंग करून क्षणभर स्वस्थ बसले.माझ्या महाराष्ट्रधर्माच्या भवितव्यतेच्या आजच्या निकालावरच माझ्या भवितव्येयाचा सोक्षमोक्ष होणार. म्हणून व्यग्रांतःकरणानें समर्थ रामदासस्वामी, कल्याण शिष्यास दासबोधाची पोथी गुंडाळून ठेवण्यास सांगून, आपण चाफळाच्या एका अज्ञात खोऱ्यांत कुबडीला टेंकून स्वस्थ बसले. नित्याप्रमाणे भरजरी बादशाही पोषाख करून घोड्यावरचा फेरफटका करणारे रंगनाथ स्वामीसुद्धा आज निकालाची वाट पहात स्वस्थ बसले. माहुलीचे नारायणबुवा, वडगांवचे जयरामस्वामी, चिंचवडचे मोरयादेव, झाडून साऱ्या संतांनी आज हरिनामसंकीर्तनास फांटा दिला आणि सर्वभूतमात्र जिजाई न्यायदेवतेचा न्याय ऐकण्यास उत्सुक झाले. केवढा हा जिजाबाईंचा अधिकार आणि केवढें त्याचे हें महात्म्य! हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकाची माता म्हणून जिजाबाईंची त्रैलोक्यात होणारी पूजा अर्चा त्या हिंदुधर्माच्या भवितव्यतेचा अखेर-निकाल देणाऱ्या न्यायदेवता म्हणून होणाऱ्या त्यांच्या महात्म्याच्या तेजापुढें काय होय? प्रत्यक्ष प्राणाची तमा न धरता किंवा विजापूरकरांच्या दांडग्या लष्करी बंदोबस्ताचीहि क्षिति न चाळगितां भराभर गडकोटकिल्ले काबीज करण्यात निरढावलेल्या शिवाजीची स्थिती या वेळीं
इकडे आड तिकडे विहीर
अशी झालेली होती. आतांपर्यंत लोकरंजनाच्या बळावरच लोकसंग्रह करण्यांत यशस्वी ठरलेल्या शिवाजीला, लोकमताच्या विरोधाला न डगमगतां ध्येयाच्या सात्विक शुद्ध तेजावरच लोकसंग्रहाचें कार्य पुढे चालविण्याचा मार्ग उमगेना. `आधीं केलें आणि मग सांगितलें` या समर्थोपदेशाचें तेज शिवाजीला रात्रंदिवस जाणवत होतें. सांप्रतच्या मनूंतील बोलघेवड्या राष्ट्राळू, पुढाऱ्यांप्रमाणें नुसत्या उदात्त तत्त्वांच्या लेक्चरें पुराणांनी शिवाजीचें कर्तव्य पूर्ण होणारें नव्हतें. न्यायदेवतेचा न्याय प्रथम आपल्या प्रत्यक्ष आचरणांत आणण्याची जाणीव त्याला होतीं; म्हणून तोहि किंचित् व्यग्र मनःस्थितीचा अनुभव घेत होता, इतक्यांत `शिवबा!` म्हणून मातेनें हांक मारली, `जी` म्हणून हात जोडून शिवाजी पुढें होणार, तोंच जिजाबाई म्हणाल्या "शिवबा, यात तूं इतका गोंधळून कां गेलास? बजाजी निंबाळकरांनी आपद्धर्म म्हणून परधर्माचा स्वीकार केला, यांत त्याचा दोष काय? आज त्यांना पश्चात्ताप होऊन ते परत आले आहेत. पश्चात्तापासारखी दुसरी शुद्ध नाहीं. व प्रायश्चित्तहि ("मनाची उपरति हाच खरा प्रायश्चित्तविधी होय, जोधपूरच्या राणा अजितसिंगाची मुलगी फर्रुखसेयर बादशहास दिली होती. त्याचा खून झाल्यावर ती बापाच्या घरीं परत आली बापाने तिला विचारले कीं, "मुली, तुला बादशहानें कसें मुसलमान करून घेतले?" ती म्हणाली, "मला जनानखान्यांत नेऊन मुसलमानी बायकांचे कपडे नेसण्यास दिले व बादशहानें कुराणांतील एक वाक्य मजकडून बोलवून घेतलें.`` राणा म्हणाला, "एवढेंच नाः ठीक तर. हा घे आपला रजपुती पेहराव आणि मी गीतेतले एक वाक्य सांगतो ते तूं म्हण; म्हणजे तूं पुन्हा हिंदु होशील." त्याप्रमाणे त्यानें करून तिला परत राजपूत करून घेतलें.) नाही. आपल्या सिंगणापूरच्या श्री. शंभू महादेवापुढें बाजाजींना लौकिकी प्रायश्चित्त देऊन खुशाल
हिंदुधर्मांत परत घेण्याची व्यवस्था
करा." न्यायदेवतेचा हा निकाल ऐकतांच साऱ्या हिदुस्थानानें एकच टाळी पिटली, श्रीकृष्ण भगवंतानीं आपला दिव्य पांचजन्य फुंकला.रामदास स्वामी `जयजय रघुवीर समर्थ` अशी भीमगर्जना करीत चाफळच्या दरींतून बाहेर पडले.
देहूस तुकोबारायांनी `पुंडलीकवरदा हssरी विठ्ठल` हा जयघोष केला व ते खांद्यावर वीणा घेऊन टाळ्यांच्या गजरात
येग येग विठाबाई
माझे पंढरीचे आई
या अभंगाच्या रंगांत मोठ्या आवेशानें नाचूं उडूं लागले. सर्व मंडळींनी हरिनामसंकीर्तनाचा एकच हलकल्लोळ केला आणि
हिंदुधर्मांची विजयध्वजा
उच्च फडकली. सर्व मराठामंडळानें बजाजीला विधिपूर्वक परत गोतांत घेतलें. तितकेंच नव्हे तर लोकमताला प्रत्यक्ष उदाहरण घालून देण्यासाठीं व वाणीप्रमाणेंच करणी करण्यात शिवाजी पाठीमागें पुढें पाहणारा नाहीं हें सिद्ध करण्यासाठीं, शिवाजीनें आपली मुलगी सखूबाई बजाजीचा मुलगा महादेव निबांळकर यांस दिली; आणि लग्नविधीच्या सोहोळ्यांत मोठ्या थाटामाटानें बजाजी व शिवाजी हे
व्याही व्याही एका ताटात जेवले.
यावरून अडीचसें वर्षांपूर्वी आमचा हिंदुसमाज आजच्या इतका अनुदार खास नव्हता हें दिसून येतें. धर्मांतर केल्यानें राष्ट्राचें नुकसान होतें, त्याची संघशक्ती लंजूर होते. आपत्प्रसंगी परधर्मस्वीकार करणारास स्वधर्मांत परत घेण्यास हरकत नाहीं, हें सतराव्या शतकातल्या जिजाबाईला चांगलें कळत होते; पण २० व्या शतकांतल्या गिरजाबाईला पटेल बिल पाहतांच भडाभड वांत्या होतात, हें आश्चर्य नव्हे काय? शिवाजीनंतर हिंदुधर्माचे भाग्य पुनः उतरणीला लागलें. छत्रपतींचा कारभार पाहणाऱ्या पेशव्याच्या अंमदानींत हिंदुधर्माच्या कांहीहि आकांक्षा पूर्ण झाल्या नाहींत. उलट प्राचीन ब्राह्मणी मताची तात मात्र त्याच्या नरड्याला पुनः लागली, चिमाजी आप्पानें वसई सर करून साष्टी प्रांतातल्या पोर्च्यूगीज क्रिस्त्याच्या राक्षसी अत्याचाराला कांही आळा घातल्याचा प्रसंग बाद केला, तर हिंदुधर्मासाठीं पेशव्यानीं काहीचीहि तसदी घेतली नाहीं. असें फार फार दुःखानें नमूद करणे भाग पडतें. उलट, पूर्वी मुसलमानांनी हिंदुंचा जसा छळ केला. त्याचीच पुनरावृत्ति हिंदु पेशव्यांनीं आपल्याच धर्मबांधवांवर करून आपल्या नावाला अक्षय काळोखी लावून ठेवली.
पेशवाई झाली हीच मोठी घोडचूक
झाली. असें जे मुमुक्षुकर्ते पांगारकर व इतर निःस्पृह इतिहासकार म्हणतात तें सर्व दृष्टींनीं विचार केल्यास वाजवी नाहीं असे कोण म्हणेल? इस्लाम धर्माच्या गंडांतरापूर्वी कित्येक वर्षे क्रिस्ती धर्माचा विंचू हिंदुधर्माच्या पायाला डसलेला आहे. त्याचें साग्र विवेचन करायला आणि क्रिस्ती मिशनऱ्यांच्या अमानुष अत्याचाराचा परिस्फोट करायला आणखी एक स्वतंत्र पुस्तक लिहिणेंच भाग आहे. भगवान श्रीकृष्णानें हात धरला तर ही गोष्ट आमच्यासारख्या दुबळ्याच्या हातून पार पडेल. सध्या हिंदुंच्या पुढे एवढाच प्रश्न आहे कीं तुम्ही
हिंदुधर्म तारणार कीं मारणार?
हिंदुधर्माला जगायचें असेल तर त्याला आतां मिशनरी बनल्याशिवाय तरणोपायच नाहीं. आज हिंदुंच्या उपनिषदांचा सर्व जगभर प्रसार झाला आहे. तुमची भगवद्गीता आज फ्रेंच, जर्मन, इटालीयन, रशियन वगैरे सर्व भाषांत भाषांतर होऊन, भगवान् श्रीकृष्णाच्या अध्यात्म-मुरलीच्या हृदयवेधी मंजुळ ध्वनीनें जगांतील सर्व राष्ट्रांतल्या प्राचीन आर्यांच्या अर्वाचीन वंशजांना मनानें हिंदु बनवीत आहे. अशा प्रसंगी कोणीं नको म्हटले तरी
हिंदुधर्म हा जगाचा धर्म
झाल्याशिवाय रहात नाहीं. संकराची फुसकी भीती संकरोत्पन्न खुशाल घालोत. भ्रष्टाचाराची काळजी भ्रष्ट खुशाल वाहोत. आत्महत्येच्या धमक्या देणारे शंकराचार्य खुशाल एखाद्या नदीनाल्यांत जलसमाधी घेवोत. सवंग लोकप्रियतेसाठी धडपडणारे पत्रकार खुशाल या बोटावरली थुंकी त्या बोटांवर नाचवीत बसोत. हिंदुधर्म साऱ्या जगाचा धर्म होणार, ही
नवविचाराची ठिणगी
आपला पराक्रम गाजविल्याशिवाय राहणार नाहीं. नव्या मन्वंतराचा हा संदेश कालेंकरून पृथ्वीच्या दक्षिणोत्तर ध्रुवांतून सर्वत्र दणदणाट करील.आज हिंदुधर्म आपल्या तारणासाठीं सर्व हिंदुंची मोठ्या काकुळतीने करुणा भाकीत आहे. त्याच्या नवीन मिशनरी अवतारांत त्याला अनेक विरोधांस तोंड द्यावे लागेल, याची सर्व हिंदुधर्माभिमान्यांनी जाणीव ठेवावी. अनेक दिव्यांतून पार पडत पडत आज हिंदुधर्म नवीन धोरणावर जगण्याचा यत्न करीत आहे. अशा आणीबाणीच्या प्रसंगी, हिंदुदेशबांधवांनो,
उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत
इसकी कळकळीची विनंति करून आणि विवेचनाच्या भरांत उणाअधिक शब्द गेला असल्यास त्याबद्दल सर्व प्रकारच्या सर्व धर्माच्या वाचकांची अत्यंत नम्रतापूर्वक क्षमा मागून, आम्ही आतां दिवाळीच्या मंगलस्नानाच्या व्यवस्थेला लागतों.
ईश्वर करो आणि हिंदुधर्माचें साम्राज्य
साऱ्या जगभर पसरून हिंदु
दिवाळीचा दीपोत्सव
एकसमयावच्छेदें करून
सर्व राष्ट्रांत साजरा होण्याचा
मंगल दिवस लवकर येवो !!!
****
संस्कृतीचा संग्राम
हिंदु आणि मुसलमान! हिंदु धर्माच्या दिव्याचें चित्र देशबांधवांपुढे ठेवितांना या प्रश्नाला जितकें महत्त्व होतें त्यापेक्षां सहस्रपट महत्त्व आज त्याला आलेलें आहे. हिंदु कोण आणि मुसलमान कोण, याची स्पष्ट परिस्फुटता मूळ ग्रंथांत केलेलीच आहे. आज या दोन भिन्न भिन्न दिसणाऱ्या समाजांत विरोधाची जी तीव्रता दिसत आहे, तिची उत्पत्ति हिंदुंच्या नादानपणांतून झालेली आहे. अभेदांतून भेद निर्माण झाला आणि अखेर तो दोनहि भेदांच्या समूळ ऱ्हासाला कारण होऊन बसला, असा हा चालूं घडीचा मामला आहे.
महायुद्धामुळें सर्व जगांत उत्पन्न झालेल्या नवचैतन्यानें हिंदुंशिवाय जगांतील सर्व समाजांच्या मनगटांतल्या नसा टरारून तट्ट फुरफुरल्या आहेत. तत्त्ववेत्तेपणाची सुकी घमेंड मारणारा बोलभांड हिंदु तोंडाची नुसती टकळी करीत बसला आहे, तर व्यवहारदक्ष इतर सर्व राष्ट्रे व समाज मनगटाच्या जोरावर आपापल्या सर्वांगीण भाग्योदयाचा मार्ग निष्कंटक चोंखाळण्यासाठी शक्तियुक्तीची पराकाष्ठा करीत आहेत. सारांश, काव्यकल्पनांत मग्न राहून, वेदांताचा फाजील गर्व वहाणारा हिंदु समाज एकीकडे आणि लाथ मारू तेथे पाणी काढू अशा आत्मविश्वासानें फुरफुरलेली व्यवहारकुशल सारी दुनिया एकीकडे, असा आजचा प्रसंग आहे.
पूर्वी हिंदुंनी राज्यें केली, जगाच्या बऱ्याचशा उपलब्ध भागांवर साम्राज्यसत्ता आणि धर्मसत्ता गाजविली, आणि वातावरणाच्या अणुरेणूंतून अझुनहि पडसाद देणाऱ्या मोठमोठ्या लढाया मारल्या, परंतु त्या सर्व हिंदुस्थान द्वीपकल्पाच्या सरहद्दीच्या आंतच. आंत घुसलेल्या गनिमांशी प्राणान्तीची टक्कर देण्यांत हिंदु वीरांनी आपल्या वीरश्रीची न भूतो न भविष्यति अशी कमाल केली खरी; पण डच, फ्रेंच, इंग्रजाप्रमाणे परदेशांत बळेंच घुसून, टांचेखालीं सांपडणारा जमिनीचा प्रत्येक तुकडा आमचा, अशी जेतृत्वाची धमक मात्र हिंदुंनी ऋग्वेदोत्तर काळीं कधींच दाखविली नाहीं. वेदान्ती हिंदु या शेळपटपणाचें मंडन कसेहि करो; सर्व दोषांवर पांघरूण घालण्याची कला हिंदुंच्या वेदान्तशास्त्राला चांगली अवगत आहे.
एखाद्या जबरदस्तानें दोन सणसणीत श्रीमुखात भडकवाव्या आणि या कमकुवत वेदान्त्यानें त्या निमूटपणें सहन करून, `हा सत्याचा जय झाला!` म्हणून फिदिफिदी दांत काढून हंसावें, ही तर आमच्या तत्त्वज्ञानाची हिंदु कसोटी!` अर्थात् जगांतल्या धकाधकीच्या मामल्यांत असला स्थितप्रज्ञ समाज साऱ्या जबरदस्त जगाच्या प्रत्येक सुस्काऱ्याला लेंड्या गाळूं लागला, तर त्यांत काय नवल? जगज्जेतृत्वाची धमक म्हणजे महत्वाकांक्षी राष्ट्राची प्राणज्योत. ही प्राणज्योत ऋग्वेदकालीन आर्यांच्या हृदयांत महत्तेजानें तेवत होती, म्हणूनच ते हिंदुस्थानाला पादाक्रांत करू शकले. ही ज्योत पुढें मिणमिण करतां करतां बुद्धोत्तरकालीं साफ विझली, आणि आजच्या आर्यवंशज हिंदुंच्या हृदयांत महत्त्वाकांक्षेची फुटकी पणतीहि आढळत नसल्यामुळें, सर्वत्र अमावास्येचा थैथयाट बोकाळला आहे.
जगज्जेत्तृत्त्वाच्या धमकीचा पलिता विझतांच, लोकसंग्रहाचा बाणा आंधळा झाला. सर्वत्र अंधार पडल्यामुळे कर्तबगारीची दौड स्वार्थाच्या टीचभर कुंपणांतच गिरक्या मारू लागली. सरहद्दी पलीकडच्या अफाट जगावर हरदिन हरघडी टौकारून पाहाणाऱ्या गरुडनेत्राची उघडझाप पिलपिल करूं लागतांच, राजकीय आकांक्षेने आकुंचितपणाची बुरख्याची ओढणी घेतली; आणि राजकारणी वचकाची मांड ढिली पडतांच हिंदुंच्या अस्तित्त्वाच्या नरड्याला नख देण्यासाठी साऱ्या जगाने आपापली नखें पाजळून सज्ज केली. हिंदुस्थानाचे चहूंबाजूंनी संरक्षण करण्याची निसर्गाने आपल्याकडून शक्य तितकी मजबूत तटबंदी केलेली असतांहि उत्तर सरहद्दीवरच्या एका बारीकशा खैबर बिळांतून परदेशी उंदरांच्या टोळ्यांनी भराभर आंत घुसून, स्थानिक हिंदु मांजरांच्या गळ्यांत घंटा बांधाव्या, हा विलक्षण चमत्कार विचार करण्यासारखा आहे.
हिंदुस्थानच्या नैसर्गिक सरहद्दीपेक्षांहि, पुराणोक्त चातुर्वर्ण्यानें हिंदु समाजाची घडी परीटघडीपेक्षाहि फार सुरेख इस्तरीत चापून चोपून बसविली, असलीं वाचाळ-पंचविशीचीं पुराणें झोडणाऱ्या भोंदू पंडितांनी तर हिंदुंचा प्रचलीत अधःपात आणि त्यांची सर्वांगीण गुलामगिरी अवश्य विचारांत घेतली पाहिजे.
हिंदु आणि मुसलमान या बिकट प्रश्नाची उत्पत्ति हिंदुच्या मूर्खपणांतून कशी झालेली आहे, याचें विस्तृत सोपपत्तिक विवेचन मूळ ग्रंथांत आलेलेच आहे. प्राचीन लोकसंग्रही बाण्याला हिंदु जर बेमान झाले नसते, तर आज हा प्रश्नच उद्भवला नसतां, हें त्यावरून स्पष्ट ध्यानीं येईल. इंग्रजांचे नोकरशाही राज्य या देशांत होईपर्यंत हिंदु मुसलमानांच्या बाह्य चुरशीचें स्वरूप शुद्ध राजकीय दिसत होतें; त्याच्या पाळ्यामुळ्या हिंदुंच्या थेट अस्तित्त्वाच्या जिवाग्रीं जाऊन बसल्या असतील, अशी मात्र कोणाचीच कल्पना नव्हती. महाराष्ट्राचा भगवा झेंडा खाली उतरून त्याच्या जागीं बनिया कंपनीचा युनियन जॅक बावटा फडफडेपर्यंत इंग्रजी सत्ता हिंदुस्थानांत दृढमूल झाल्याची कोणाचीच खात्री पटणें शक्य नव्हते.
अखेर इंग्रजांच्या सवाईसोट्या राज्यपद्धतीच्या दडपणाखाली हिंदु आणि मुसलमान सामनेवाले सारखेच चीत होऊन, दोघांच्याहि दामटीचे आकार एकाच वळणाचे दिसूं लागले. इंग्रजी राज्यकारभाराच्या सणसणीत तापलेल्या तव्यावर दोघांची भाकर सारखीच अभेद भावानें भाजली जात असतांना उगाच कधिंमधिं चुरचुर फुरफूर होत असे. नाहीं असें नाहीं. पण ती अगदीच क्षुल्लक. १८५७ च्या बंडांत तर हिंदु आणि मुसलमान अगदी एकजीव व एकजिव्ह होऊन, त्यांनी इंग्रेजी सत्तेला पायबंद लावण्याचा अखेरचा निर्वाणीचा थैमान केला. पण इंग्रेजांची सद्दी जबरदस्त ! काडतुसाला लावलेल्या डुकराच्या चरबीने हिंदु मुसलमानांची बुद्धि राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी कितीहि भडकली, तरी अखेर त्या चरबीचें वंगण इंग्रजांच्या जोरावर सद्दीलाच पडावें, हा अनादि अनंत काळाच्या पटांतला एक रहस्यमय चित्रपट होय, यांत मुळींच शंका नाही.
सत्तावनच्या बंडाने हिंदु आणि मुसलमान या दोन प्रमुख हिंदी समाजांच्या राजकीय महत्त्वाकांक्षाचे वस्त्रगाळ पीठ झाल्यामुळें, अखिल हिंदुस्थान देशाच्या राष्ट्रीय चैतन्याला पूर्ण बधिरता आली. त्याची हालचाल नष्ट झाली. वर्तमानकाळाच्या धमधमणाऱ्या वर्मावरच मर्मी घाव पडल्यामुळें, भूतकाळचा पराक्रम त्याला दिसेनासा झाला व भविष्यकाळाच्या दिशेला काळाकुट्ट भयाण अंध:कार पसरला.
सुमारें दोन अडीच शतकें राजकारणाच्या क्षेत्रांत हमरीतुमरीचे संग्राम करून, यशापयशाच्या भरतीओहटीनें साऱ्या जगाच्या भवितव्यतेला उलथी पालथी करणारे हिंदु आणि मुसलमान, १८५७ साली इंग्रेजी सत्तेची खास अखेरची ठोकर खाऊन जमीनदोस्त होतांच, आसेतुहिमाचल हिंदुस्थानांतच नव्हे, तर साऱ्या उपलब्ध दुनियेत मसणवटींतील घोर शांतता नांदू लागली. शांततेच्या याच हंगामांत इंग्रेजी सत्तेचा पाया येथे कायमचा बसला गेला. तागडीबहाद्दर बनिया कंपनीने आपल्या राजकीय सत्तेची कटकट महाराणी व्हिक्टोरियाच्या ओटीत घातली आणि सर्वत्र
व्हिक्टोरीया निशाणीं धरुनि चहुंकडे चालती शुद्ध नाणीं
या सोज्वळ गाण्याचे घाणे हिंदुस्थानांत घरोघर सुरू झाले. हिंदु मुसलमानांच्या राजकारणी महत्वाकांक्षा आतां ठार झाल्या. बापजाद्यांचे पराक्रम आठवून त्यांचे पोवाडे गाण्यापलीकडे, आणि कधिंमधीं दिल्लीदरबारासारख्या प्रसंगी दोघांनी मिळून इंग्रेजी सत्तेची मनमुराद खुषामत करण्यापलीकडे, त्यांना कांही धंदाच उरला नाहीं. मोंगल बादशाही आणि हिंदु स्वराज्यशाही यांच्या झगड्यांत हिंदु आणि मुसलमान असे दोन युध्यमान भिन्न तट इतिहासांत आपल्याला दिसतात खरे, पण वास्तविक पाहिलें तर हिंदुंशी झगडणारें मुसलमान हे खरेखुरे तुर्की मुसलमान नसून, अस्सल हिंदु संस्कृतीचे व हिंदु रक्ताचे इस्लामी पेहराव केलेले अस्सल हिंदुच होते. म्हणूनच एकरंगी एकशिंगी इंग्रजी सत्तेच्या एकाच तडाख्यानें या एकजिनसी संस्कृतीच्या एकदेशी प्रतिस्पर्ध्यांना चुटकीसरसें चीत करून, त्यांच्या राजकारणी आकांक्षेला बेरोजगार केलें.
मनुष्याचें मन हें जात्यासारखें आहे. त्याला एकसारखें कांही ना कांहींतरी दळायला दळण लागतें. दळणाची कांहींच सामुग्री त्यात पडली नाहीं, तर ते स्वतःलाच दळून भरडूं लागतें. हिंदु मुसलमानांच्या मनाची निष्क्रीयता बंडोत्तरकाळीं इतकी वाढली कीं ते मेल्यांपेक्षाहि मेले बनले. राजकारणी बुद्धिबळाचा पटच त्यांच्या हातून हिसकावून नेल्यामुळें, त्यांचे रिकामटेकडें मन सैरावरा भडकूं लागलें. आपण होऊन आंगावर आलेलें देशाच्या राज्यकारभाराचें किचकट ओझें परोपकारी दयाळू मायबाप इंग्रेजी सरकारनें स्वतःच्या शिंगावर घेतल्यामुळें, हिंदु मुसलमानांना ऐदीपणाशिवाय दुसरा कांही व्यवसायच उरला नाहीं. त्यांच्या मनाच्या जात्यांतले दळण कमी झालें, आणि तें स्वतःलाच भरडण्याच्या एकेरीवर आलें. अशा स्थितींत दोघांहि समाजांना सामाजिक आणि धार्मिक बाबतीची वाळू भरडण्यास सांपडली.
वाळूच्या या दळणांत मतभेदांचे गारगोटीचे कांही कणखर फत्तर लागतांच, त्यांच्या स्फोटाची पहिली सलामी १८९३ सालीं काठेवाडांत प्रभासपट्टण शहरी हिंदु मुसलमानांच्या दंग्यानें दिली. स्फोट होऊन ठिणगी पडण्याचाच काय तो अवकाश असतो. ती एकदां पडली की गवताची गंज किंवा एखादा वाडाचसा काय, साऱ्या विश्वाचें क्षणार्धांत होळकुकडे करणें तिच्या हातचा केवळ मळ होय! प्रभासपट्टणची ठिणगी धुमसतां धुमसतां अखेर तारीख ११ ऑगस्ट सन १८९३ शुक्रवार रोजीं मुंबईच्या जुम्मा मशिदींत आगीचा भयंकर स्फोट उडाला आणि सतत एक पंधरवडा चाललेल्या त्या हिंदु मुसलमानांच्या दंग्याने सारें हिंदुस्थान गदगदा हादरले गेलें. मुंबापुरी रक्तांत न्हाऊन निघाली. रस्तोरस्ती हिंदु-मुसलमानांची प्रेतें पडली. बेसुमार अत्याचार घडले.
कित्येक देवळे व मशिदी उद्ध्वस्त झाल्या. हिंदु स्त्रियांवर बलात्कार झाले. शहरांत शांतता राखतां राखतां मुंबई सरकारच्या लष्करी आणि आरमारी सैन्याच्या नाकीं नळ वाहू लागले. अखेर २५ ऑगस्ट १८९३ रोजीं दंगेखोर लोक काबूंत येऊन, शहरांत शांततेची चिन्हें दिसूं लागली. हिंदु मुसलमानांत भयंकर रक्तपात, आतोनात प्राणहानी आणि मनस्वी अत्याचार घडविणाऱ्या या कुप्रसिद्ध मुंबईच्या दंग्याने हिंदु आणि मुसलमान लढ्याचा प्रश्न अलिकडच्या काळांत विशेष महत्त्वानें पुढे आणला. अभेदात्तच भेद उत्पन्न झाला. भेदांत विपर्यासाची कीड पडली. रिकाम्या मनांत या किडीने पोखरण घातली. पोखरणींत नसत्या द्वैताचा विषबिंदु पडला. विषाने रक्त दूषित झाले आणि आपपर भेद विसरून हिंदु आणि मुसलमान या नकली बाह्यांगावरच झगडण्याची राष्ट्रविघातक कुबुद्धि सैतानी खेळ खेळूं लागला.
रिकाम्या मनाचा दुष्परिणाम, दुसरे काय? सतत तीन शतकें राजकीय वर्चस्वासाठी प्रामाणिक चुरशीनें एकमेकांशी झगडणारी हिंदु मुसलमानांची मनोवृत्ति, राजकारणाचा आटारेटा किंचित हातावेगळा होतांच, सामाजिक व धार्मिक स्वरूपाच्या क्षुद्र भेदांत रममाण होऊन वर्दळीवर यादी, आणि गेल्या महायुद्धानें निर्माण झालेल्या नवचैतन्याच्या प्रसादाला पात्र होणाऱ्या हिंदी राष्ट्राच्या आकांक्षेच्या मार्गात त्या भेदाची पर्वतप्राय धोंड पडावी, हें खरोखर देशाचे दुर्दैव होय.
मुंबईच्या दंग्यामुळें हिंदु आणि मुसलमानांतील तेढ किती विकोपास गेलेली होती, हें अलीकडच्या काळांत जगाला प्रथमच दिसलें. या तेढीच्या तपशीलाचें पृथ:करण केलें तर स्वराज्यसत्ता गमाऊन एका त्रयस्थ वरचढ सत्तेचे गुलाम बनलेल्या गुलामांच्या मनोवृत्तीला साजेशोभेसाच त्याचा मसाला होता. स्वराज्य-स्वातंत्र्याच्या बाळ्याबुगड्या गमाऊन वाडवडिलांच्या गतवैभवाच्या सुक्या ओल्या गप्पांची भोकें कुरवाळीत बसणाऱ्या गुलाम हिंदु मुसलमानांच्या सडक्या मनोवृत्तीचा तो यथाप्रमाण धांगडधिंगा होता. त्या वेळच्या शहाण्यासुर्त्या वर्तमानपत्रकर्त्यांचे उद्गार पाहिले, तर असें स्पष्ट दिसून येतें की हिंदु आपल्या मुत्सद्देगिरीच्या गुर्मींत होते आणि मुसलमान आपल्या आडदांडपणाच्या मिजासीत होते.
बळी तो कान पिळी हा सनातन कायदा मुसलमानांनी हातीं घेतला होता आणि नेभळे हिंदु इंग्रेज अधिकाऱ्यांवर पक्षपाताचा आरोप करून, बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांना गतेतिहासाचे दाखले दाखवून, सुक्या शाब्दिक धमक्या देत होते. त्या वेळी कै. टिळकांनी प्रस्तुत दंग्यांची चिकित्सा करणारे केसरींत लिहिलेले लेख पाहिले तरी त्यांत हीच संकुचित वृत्ति व्यक्त झालेली आढळते. हिंदु मुसलमान प्रश्नाकडे खऱ्या राष्ट्रीय दृष्टीने पहाण्याची जी व्यापक वृत्ति आज प्रचलीत झाली आहे, तिचा लवलेशही टिळकांच्या अंतःकरणाला शिवलेला नव्हता. उठल्या सुटल्या भल्याबुऱ्या पातकाचें खापर इंग्रेजांच्या माथ्यावर फोडून, आपल्या नेभळ्या तोंडपाटिलकीचें मंडण करण्याचा केसरीनें महाराष्ट्रांत रूढ केलेल्या परिपाठाचा उगम याच लेखांत पहावा. या दोन समाजांच्या एकीकरणानेंच भावी हिंदी राष्ट्राचें दृढीकरण केल्याशिवाय गत्यंतर नाहीं, अशी जागृति तत्कालीन इतर अनेक विचारवंत हिंदु-मुसलमान पुढाऱ्यांना झाली नव्हती, असे नव्हे. परंतु अखिल हिंदुस्थानांत व्यापक धोरणाच्या व अभेदभावाच्या राष्ट्रीय जागृतीची पुण्याई कै. टिळकांच्या पदरी बांधण्याचा उपद्व्यापी अट्टहास करणाऱ्या शहाण्यांना इतकेंच सप्रमाण बजावणें अवश्य आहे कीं, हिंदुंचा-विशेषतः महाराष्ट्रांतल्या हिंदुंचा स्वाभिमान जागृत करण्याचा कै. टिळकांनी यत्न केला, असे सामान्य विधान केल्यास काही हरकत नाही; पण सध्यां विकसित झालेल्या हिंदु मुसलमानांच्या ऐक्याच्या व्यापक कल्पनेचा धागा सुद्धां कै. टिळकांच्या पादुकांना किंवा पगडीला गुंडाळतांना मात्र जरा दहा अंक मोजा.
टिळकांनी मुसलमानांचा प्रश्न जर त्यावेळी खऱ्याखुऱ्या व्यापक उदारबुद्धीनें, सोडविण्याचा यत्न केला असता, तर आज महाराष्ट्रांत तरी निदान चित्पावन चित्पावनेतर वादाइतकें हिंदु मुसलमान वादाला तीव्र स्वरूप खास आलें नसते! "इंग्रजांनी हिंदुस्थानांत पाऊल ठेवण्यापूर्वीच मुसलमानांची सत्ता मोडत चालली होती, व इंग्लिशांनी हिंदुस्थानाचें राज्य कमावलें तें मुसलमानांपासून नव्हे, तर मराठे व शीख लोकांपासून होय" हा ऐतिहासिक पुरावा युरपियन टीकाकारांच्या मुस्कटावर झुगारतांना, मुसलमानांविषयीं तुंकार दर्शवीत कै. टिळक मुसलमानांना व त्यांच्या पाठिराख्या इंग्रेज अधिकाऱ्यांना बजावून लिहितात कीं, "इंग्रज सरकारचा जर या देशांत रिघाव झाला नसता तर आज जी एक दोन मुसलमान संस्थानें राहिली आहेत. तीही केव्हांच नामशेष होऊन गेली असती." [टिळकांचे लेख, पृ.२०६]
हिंदु मुसलमान प्रश्नाचा परीघ केवढा विस्तृत आहे, त्याच्या विरोधी तपशीलाचा दूरवर धोरणानें समन्वय कसा करता येईल आणि हिंदी राष्ट्राच्या भावी पुनर्घटनेसाठीं दोघांनींही कांहीं ठळक क्षेत्रांत समरस निदान समगामी कसें व्हावें, याची रूपरेषा आंखण्याऐवजीं कै. टिळकांनी हिंदु मुसलमानांत यदृच्छेनें उत्पन्न झालेल्या गुलामगिरीच्या शुद्र भावनांची तेढ अधिकाधिक तीव्र करण्याची कामगिरी मात्र बरीच बजाविली, यांत मुळीच संशय नाही. इतकेंच नव्हे, तर मुंबईस दंग्याचा धडाका उडाल्यानंतर त्याचा तितकाच जोराचा व भयंकर पडसाद येवलें, बेळगांव, मालेगांव, राजापूर वगैरे ठिकाणी उमटतांच, ही दंग्याची साथ अधिक पसरू नये म्हणून हिंदु मुसलमानांच्या जबाबदार प्रतिनिधींची एक सभा भरविण्याचा कै. जस्टिस रानडे यांनी प्रयत्न केला. त्यावेळींसुद्धां टिळकांच्या केसरीनें या संयुक्त सभेची हेटाळणी करून, `फक्त हिंदुंची` सभा बोलवावी असा हट्ट धरला आणि कै. रानडे व त्यांच्या अनुयायांची आपल्या कुप्रसिद्ध `राष्ट्रीय` भाषेत संभावना केली. कै. टिळकांची खुमखुम येथेंच थांबली नाही.
हिंदु मुसलमानांची तेढ मुंबईच्या दंग्यानें व्यक्त करतांच आणि येवलें मालेगांवच्या प्रतिध्वनीनें ती विशेष स्पष्ट सिद्ध होतांच, देशांतले हिंदु मुसलमान पुढारी त्यांच्या ऐक्याचा प्रश्न यथामति यथाशक्ती सोडविण्याचा यत्न करू लागले. या प्रयत्नांची दिशा व पद्धत वेळोवेळीं कार्यकर्त्यांच्या आंगभूत गुणावगुणांप्रमाणे कधिं बरी, कधिं वाईट, कधिं ऐक्यवर्धक तर कधिं बेकीचें भगदाड अधिकच दुणावणारी, अशी होत गेली. त्यांतच कै. टिळकांनी गणपतीच्या मेळ्याची नवीन टूम काढली व शिवाजीउत्सव सुरू केला. या दोनही गोष्टी जर उदार व्यापक धोरणावर चालविल्या असत्या, आणि त्यांचें राष्ट्रीय महत्त्व सर्वस्पर्शी मुत्सद्देगिरीने महाराष्ट्रीय जनतेवर बिंबविण्याचा त्यांनी यत्न केला असता, तर हिंदु संस्कृतीला व हिंदु रक्ताला फारसा पारखा न झालेला अखिल महाराष्ट्रीय मुसलमान समाज त्यांना खात्रीनें आपलासा करता आला असता! पssण !!
जात्याच अत्यंत महत्वाकांक्षी व वरचढ प्रवृत्तीच्या टिळकांना स्वदेशी मुसलमानांच्या संस्कृतिसाम्याचें भान राहिलें नाहीं, आणि गणपतीचे मेळे व शिवाजी उत्सव या दोन दुधारी पात्याच्या तलवारीच्या हातवाऱ्यानें त्यांनी हिंदु मुसलमानांच्या भावना अधिकच क्षुब्ध व छिन्नभिन्न केल्या. मेळ्यांतून व शिवाजीउत्सवांतून मुसलमानांची यथास्थित निर्भत्सना होऊ लागतांच, महाराष्ट्रांतले बरेचसे उनाड कवि व नाटककार एकामागून एक भराभर उदयास येऊ लागले, आणि त्यांच्या इस्लामद्रोही कवितांचा व `ऐतिहासिक`(?) गद्यपद्य नाटकांचा केसरीकडून जाहीर सन्मान होऊ लागला, महाराष्ट्रांत असा एक काळ होता कीं, मुसलमानांची निर्भत्सना केल्याशिवाय आम्हा हिंदुंचा एकही `राष्ट्रीय` उत्सव यथासांग पार पडत नसे.
एकहि `सार्वजनिक` सभा घसघशीत व ठसठशीत वठत नसे, आणि केसरी सांप्रदायिक एकाहि नियतकालिकाला आपलें कर्तव्य नीटपणे बजावल्याची कंडू शमत नसे. त्या वेळीं गिलचांचा सूड या सारखी मुसलमानांच्या आईमाईचा उद्धार करणारी हलकट नाटकें सुद्धा कै. टिळकांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या खास आशीर्वादामुळे यशस्वी होत असत. शिवाजीउत्सवाचा तर या कामीं अनेक बोलघेवड्या दे. भ. नीं खुद्द टिळकांच्या नाकासमोर मनमुराद खेळखंडोबा केला. सन्मित्र समाज नांवाच्या एका पुणेरी मेळ्यानें तर पुणे शहरच्या चव्हाट्या तिवाट्यावर ऐतिहासिक हिंदु मुसलमान पात्रें प्रत्यक्ष नाचवून, आपल्या केसरी प्रासादिक देशभक्तिचा शिमगा वृत्तपत्री धुळवड शेणवडीपेक्षां रेंसभर सुद्धा कमी इरसाल नसल्याचें सिद्ध केले. या फाजील मेळ्याचा फाजीलपणा अजूनहि कमी झाला नसून, मुसलमानांवर भुंकण्यास सवकलेलें हें `राष्ट्रीय` कुतरडें कै. नामदार गोखले प्रभृति उदारमतवादी स्वकीयांचे लचके तोडतां तोडतां, आता तर कुलीन स्त्रियांची इज्जत जाहींर रीतीनें घेत असतें.
सारांश, टिळकांच्या प्रोत्साहनानें भरंवसाट भडकणाऱ्या तत्कालीन राजकारणी वातावरणाचें नि:पक्षपणे समालोचन केलें तर असें स्पष्ट विधान करणें भाग पडले कीं त्या वेळच्या महाराष्ट्रीय हिंदुंच्या राजकीय मोक्षप्राप्तीच्या कल्पनांचे भांडवल मुसलमानांच्या बीभत्स निर्भत्सनेंतूनच काढलें जात असे. याचा परिणाम फार वाईट झाला आणि त्याचीं कडुजहर फळें महाराष्ट्राला अजून भोगावयाची आहेत. महाराष्ट्रातले मुसलमान न हिंदुर्नयवनः असे असून, बाह्यांगावरील कपड्यांशिवाय त्यांच्यांत व हिंदुंत कसलाही भेद नाहीं. त्यांची राहणी, आचारविचार, उदरभरणाचे व्यवहार, संसाराची सुखदुःखे सर्वस्वी हिंदुप्रमाणेंच एकजिनशी आहेत. कारण ते जात्या मुळचे हिंदुच, पूर्वजांवर झालेल्या धर्मांतराच्या बळजबरीमुळेंच ते - आमच्याच रक्तामासाचे आप्तसंबंधी असून सुद्धां आज निव्वळ नांवाला आमच्यापासून पारखे झाल्यासारखे दिसतात इतकेंच.
अशा रीतींनें धर्माचरणाच्या बळजबरीच्या बाबीशिवाय इतर सर्व व्यवहारांत महाराष्ट्रांतले मुसलमानभाई हिंदुंशी एकजीव असतां, टिळकांच्या गणपती-मेळ्यांनी व शिवाजी उत्सवांनी त्यांची मनें हकनाहक दुखविली गेली आणि नाइलाज म्हणून ते फटकून वागूं लागले, तर त्यांत दोष कोणाचा? कै. टिळक लोकसंग्रहाचे अर्वाचीन प्रणेते असें त्यांचे भक्तजन कंठरवानें वेळीं अवेळीं प्रतिपादन करीत असतात. पण त्यांच्या लोकसंग्रहाला मुसलमानांचा मात्र कधीहि विटाळ झाला नाहीं. मुसलमान हे लोकच नाहींत कीं काय? आणि ज्या राष्ट्रोद्धारासाठीं टिळकांनी आपला `राष्ट्रीय` संप्रदाय निर्माण केला, त्याला या लोकांच्या संग्रहाची आवश्यकता नाहींच की काय? मुसलमानांत जातिभेद नसला, तरी प्रांतपरत्वें उच्च नीच संस्कृतीची भिन्नता पुष्कळच आहे.
सगळ्या ठिकाणचे सगळेच मुसलमान एकजात शौकतअल्ली टैपाचे किंवा मोपले सांच्याचे नाहींत. महाराष्ट्रांत तर सर्रास शुद्ध हिंदु मुशीचा मुसलमानच आढळून येतो. संस्कृतिसाम्याचा फायदा घेऊन व्यापक मिशनरी धोरणानें येथल्या मुसलमानांना कै. टिळकांनी जर आपल्याकडे ओढण्याची खटपट केली असती, तर आज निदान महाराष्ट्रापुरता तरी हा प्रश्न पुष्कळच सुटला असता खास. पण ज्याचें सर्व राजकारणच मुळीं जातिभेदाच्या आणि स्वजातिवर्चस्वाच्या मसाल्याचे, तेथें मुसलमानाला पुसतो कोण?
खरें पाहिलें तर बंगालच्या फाळणीची चळवळ निर्माण होईपर्यंत महाराष्ट्रीय हिंदुची राजकीय दृष्टी अत्यंत संकुचित आणि एकलकोंडेपणाचीच होती. कै. टिळकांच्या केसरी संप्रदायाची स्वराज्याची दृष्टी सुद्धा गायकवाड वाड्याच्या कुंपणापलीकडे फारशी जात नसे. राष्ट्रीय सभेच्या वार्षिक लळितांत देवपार्टी व राक्षसपार्टी एक दोन दिवस कांही तरी अललल डुर्रर्र करून राष्ट्रैक्याची पुराणे झोडीत; परंतु नेहमीं पुराणांतली वांगी पुराणांत ठेवण्यापलीकडे त्यांचाहि कांही इलाज नसे.
बंगालच्या चळवळीच्या दणक्याने महाराष्ट्रीय हिंदुंची राजकीय स्वार्थाची दृष्टी उदारपणाकडे जरी बरीच कलंडली, तरी हिंदु मुसलमानांच्या ऐक्याच्या बाबतीत त्यांचा सुतकी बाणा टिळकांच्या हयातीपर्यंत तरी निदान फारसा कमी झाला नाहीं. नुसता शाब्दिक चोंबडेपणा मात्र रगड होता खरा! ज्या राष्ट्र्यैक्याच्या विकासासाठी आजची कार्यक्षम राष्ट्रीय सभा कसोशीनें झटत आहे, त्याचा पाया जें प्रांतिक ऐक्य, त्याचीहि पर्वा आमच्या हृदयाला फारशी स्पर्श करीत नसे, हिंदुस्थानच्या राजकीय क्षेत्रांत कल्पनातीत चापल्यानें भराभर पालटणाऱ्या राजकारणी उलथापालथीचे चित्रपट पाहून सुद्धा मुसलमानांच्या मनधरणीचा किंवा एकीकरणाचा प्रश्न आम्हाला फारसा बोंचतच नसें, मात्र राजकीय अधःपाताची जाणीव होऊन, मुसलमान संघ कावेबाज नोकरशाहीच्या बगलेंत घुसण्याचा यत्न करीत असतां, महाराष्ट्रश्वुरीण केसरीनें त्याची `प्यारी रंडी` संज्ञेने मनमुराद निंदा करायला मात्र मुळीच कमी केलें नाहीं.
सारांश, हिंदुस्थानाच्या राष्ट्रीय उद्धारांत हिंदुंना मुसलमानांच्याहि एकीची आवश्यकता आहे, ही गोष्ट राजकीय क्षितिजावर महात्मा गांधींचा उदय होईपर्यंत कोणीच लक्षांत घेतल्याचें दिसत नाहीं. हिंदुस्थानच्या सुदैवानें सत्याग्रही महात्मा गांधींचा उदय होऊन, त्यांच्या तपःसामर्थ्याच्या दिव्य तेजानें सर्वत्र अननुभूत प्रबोधनाची दांडगी खळबळ उडाली आणि दुटप्पी टिळक संप्रदायाचा अस्त झाला. वार्षिक हरदासी कीर्तनें करणाऱ्या राष्ट्रीय सभेंत नवचैतन्याचा विलक्षण संचार होऊन तिनें मुस्लीम लीगचा सवता सुभा आमूलाग्र पचनी पाडला आणि स्वराज्यप्राप्तीच्या कार्यक्रमांत अस्पृश्योद्धाराच्या जोडीनेंच, मुसलमान बांधवाच्या ऐक्याला विशेष प्राधान्य देण्यांत आलें.
खुद्द महात्मा गांधीनीच हा प्रश्न हाती घेतल्यामुळे, त्यांत कांहीं थातरमातर किंवा हस्तिदंती कावेबाजपणा घुसणें शक्यच नाहीं, अशी सर्व राष्ट्राची तेव्हांच खात्री पटली. हिंदु मुसलमानांच्या दिलजमाईचे अनेक अकल्पनीय प्रकार आतांपर्यंत घडून आले. येत आहेत व पुढे येतील. तथापि या दिलजमाईची धडपड सुरू असताच, जणुं काय तिचा आरपार फोलपणा सिद्ध करण्यासाठी मलबारांत मोपलें मुसलमानांची बंडाची भयंकर गडबड उडाली. मोपल्यांच्या बंडाने व परवांच्या मुलतानच्या दंग्याने हिंदु मुसलमानांच्या दिलजमाईचा प्रश्न इतका बिकट होऊन बसला आहे की तो सोडविण्यासाठी महात्मा गांधीची सत्याग्रही पुण्याई सुद्धा अंतःपर हतबल ठरून पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही, मग इतरांची कथा काय?
विशिष्ट राजकीय हेतू साधण्यासाठी किंवा महात्माजींच्या उत्कट तपस्सामर्थ्याने उडालेली गाळण छपविण्यासाठी, एखादा शहाणा `राष्ट्रीय` वा प्रश्नाची शाब्दिक कसरतीनें टोलवाटोलव करू म्हणेल तर ते दिवस आता उरलेले नाहीत. हिंदु मुसलमानांची एकी झालीच पाहिजे, त्याशिवाय स्वराज्य प्राप्त होणार नाहीं व यदाकदाचित् झालेंच तर ते टिकणारहि नाहीं; हा महात्मा गांधीचा सिद्धांत बाह्यतः कितीहि खरा असला, तरी ती एकी कशी घडवून आणता येईल याचे स्पष्टीकरण किंवा बिनचूक निधान मात्र त्यांना मुळीच करता आले नाही. हिंदुंनी मशिदीत जाणें आणि मुसलमानांनी देवळांच्या आवारांत किंवा गरुडमंडपांत येऊन व्याख्यानें देणें, इत्यादि प्रकार बाह्यांगाचे आहेत व ते नेहमीं टिकाऊच रहातील असा भरंवसा कोणी देऊंहि शकणार नाहीं.
म. गांधींनी हिंदु मुसलमानांच्या ऐक्याविषयीं ज्या खटपटी केल्या व आपल्या `यंग इंडिया` पत्राद्वारे जे विचार व्यक्त केले, त्यांचें आज जो कोणी काळजीपूर्वक पर्यालोचन करील, त्याला हेंच कबूल करावे लागेल की गांधी हे कितीहि महात्मा असले, तरी प्रस्तुत वादांत पौराणिक बडबडी पलीकडे त्यांच्या महात्म्याची फारशी मजल गेलीच नाही. हाच सिद्धांत किंचित निराळ्या भाषेत मांडावयाचा तर तो असा मांडतां येईल की म. गांधींच्या सत्वगुणप्रधान पुराणांचा आसुरी मायेनें चिंब भिजून निघालेल्या त्यांच्या मुसलमान शागीर्दांवर कांहीच परिणाम झाला नाही. इतकेंच नव्हे, तर हिंदुंच्या विवेकबुद्धीला पटतील अशा काहिहि सूचना त्यांना केव्हांहि करता आल्या नाहीत. त्यांच्या `यंग इंडिया`च्या पुराणांवर भाळून जाऊन बेताल नाचणारे हिंदु वेताळ त्यावेळी जरी मुबलक बोकाळले होते, तरी तीं पुराणें किती फोल होतीं व ते सिद्धांत किती लेचेपेचे होते, याचा पुरावा मोपल्यांच्या दुष्ट बंडानें जेव्हांच्या तेव्हांच दिला.
विशेषतः मोपल्यांच्या बंडाचा भयंकर धुमाकूळ माजल्याच्या बातम्यांनीं सारे हिंदुस्थान दणदणूं लागल्यावर सुद्धां, त्यांचा फोलपणा व मोपल्यांचा `मर्दपणा` सिद्ध करण्यासाठी गांधीनीं दाखविलेला कानाडोळ्याचा उदासपणा व असहकारितावाद्यांनी बंडाच्या खऱ्या हकिकती खोट्या ठरविण्यासाठी केलेल्या धडपडी कोणाच्याहि स्मरणांतून जाणे शक्य नाहीं. मोपल्यांच्या अमानुष अत्याचारांचे भरभक्कम पुरावे भराभर सर्वत्र प्रसिद्ध होताच, नाइलाज म्हणून तारीख २८ जुलै १९२१ च्या यंग इंडियांत म. गांधींनी जें प्रवचन झोडले आहे, त्यांतलीं विधाने कोणाला कधी काळी पटतील तीं पटोत!
त्यांत वस्तुस्थितीचें जितकें अज्ञान भरलें आहे, तितकाच हिंदुंचा तेजोभंग आहे. जितका मनाचा नामर्दपणा आहे, तितकाच विचारसरणीचा कमकुवतपणा आहे. म. गांधी म्हणतात :--
(१) जर इस्लामाचा पाया जुलूम जबरदस्तीवर असेल तर आमचा खिलाफतीचा पुरस्कार चुकीचा होईल. इस्लाम धर्मप्रसाराचा इतिहास मानवी रक्तांत बुचकळलेल्या तलवारीच्या लेखणीनेंच आजपर्यंत लिहिला गेलेला आहे, हें महात्मा गांधींना मुळींच अवगत नसेल काय? जबरदस्तीने मुसलमान धर्माची दीक्षा देण्याचे फर्मान कुराणांत असो वा नसो; इतिहासाचा पुरावा डोळ्याआड करणें, याला दांभिकपणा असे म्हणतात.
(२) बळजबरीनें इस्लामधर्मदीक्षा देण्याच्या पातकाबद्दल, ऐतिहासिक दृष्ट्या सर्रास सर्व मुसलमान समाजाला दोषी ठरवितां येणार नाहीं. अशा कृत्याचा जबाबदार (?) मुसलमानांनी निषेधच केलेला आहे. म. गांधीचें ऐतिहासिक ज्ञान केवढें आहे, त्याचा वाद घालीत बसण्यांत अर्थ नाहीं. परंतु जबाबदार मुसलमानांचा `निषेध` म्हणजे बाटलेल्या हिंदुंचा `धर्मपरावर्तन विधि` नव्हे खास. मोपल्यांच्या धार्मिक अत्याचारांवर मलमपट्टी लावणारे डॉ. मुंजे यांना म. गांधीचे कल्याणशिष्य शौकत अल्ली यांनी दिलेलें सणसणीत उत्तर विचार करण्यासारखें आहे. अल्लीसाहेब आपल्या मुलाखतीत म्हणाले, "मोपल्यांच्या अत्याचारांबद्दल मी शक्य तितक्या तीव्रतेने निषेध करीन, परंतु बाटलेले हिंदु परत हिंदु धर्मात घेण्याच्या खटपटीला माझ्याकडून कसलीहि मदत मिळणें शक्य नाहीं, तशी आम्हांला धर्माज्ञाच नाहीं, याबद्दल फार दिलगिरी वाटते." `अल्ला हो अकबर`च्या आरोळ्या किंचाळणारी लहान पोरें गल्लोगल्ली फिरविणाऱ्या शहाण्या देशभक्तांच्या डोक्यांत या कानपिचकीचा कांहींच उजेड पडूं नये, हे कशाचें लक्षण?
(३) मोपल्यांना खिलाफतीची अस्पष्ट माहिती झाली होती, पण अनत्याचाराच्या तत्त्वांचा त्यांना गंधहि नव्हता. खिलाफत व काँग्रेसच्या कामगारांना मलबारांत जाण्याचा सरकारकडून प्रतिबंध झाला नसता, तर या बंडाचा अंकूर गर्भांतल्या गर्भात ठेचला गेला असता. आता पुढें येत असलेल्या पुराव्यांवरून (अ) खिलाफतवाल्यांची चिडखोर व माथीं भडकवणारी शिकवणूक व (ब) ब्रिटीश राज्य आतां भुसभुशीत झाले आहे. त्याच्या जागी खिलाफत राज्य आणून स्थापन करावयाचे आहे. अशा गप्पा मलबारांबाहेरच्या इस्लामी चळवळ्यांनी मलबारांत जाऊन मोपल्यांच्या डोक्यांत भिनविल्या, अशी दोन मुख्य कारणें मोपले बंडाला कारण झाल्याचे सिद्ध होत आहे. त्यावरून म. गांधींच्या विधानांना काय किंमत द्यावयाची ती वाचकांनीच ठरविलेले बरें.
(४) मोपल्यांचा माथेफिरूपणा म्हणजे हिंदु मुसलमानांच्या एकीचा भक्कमपणा असेंच मला वाटते, कारण एवढें बंड झालें तरी आम्ही (हिंदु) अगदीं शांत बसलों. नामर्दपणावर पसरलेली इतकी छानदार विणीची खादी इतरत्र पहावयास मिळणार नाही.
(५) जबरदस्तींचे धर्मांतर किंवा त्याहिपेक्षां वाईट गोष्टी यापेक्षां सध्यांचें (इंग्रजी सत्तेचें) जूं अधिक वाईट नव्हे काय? विचारी वाचकांनीच उत्तर द्यावे.
(६) ४ ऑगष्ट १९२० च्या यंग इंडियांत गांधी म्हणतात, इस्लाम हा मोठ्ठा उदार धर्म आहे. त्यावर आणि त्याच्या अनुयायांवर विश्वास ठेवा. जोपर्यंत खिलाफतीचा तंटा चालला आहे. तोपर्यंत गोरक्षण किंवा इतर धार्मिक प्रश्नांत मुसलमानांशी आपण नुसतें बोलणें लावणें, हे सुद्धां महापातक आहे... आपण जर खिलापत वाचविण्याचा झटून प्रयत्न केला तर मुसलमानहि गोरक्षणास मदत करतील, अशी मी ग्वाही देतो. असल्या पोकळ विचारसणीने हिंदु मुसलमानांत ऐक्य घडवून येणे शक्य नाहीं, हे आतां खुद्द गांधीभक्तांच्याहि अनुभवास आले आहे. मग गांधींना एखाद्याने `मॅडमुल्ला` म्हटलें तर त्यांनी का खवळावे?
यंग इंडियांत म. गांधीनी हिंदु-मुसलमान ऐक्यावर जेवढे लेख लिहिले आहेत, त्या सर्वांचा मासला वरील धर्तीचाच आहे. अशा लेच्यापेच्या विचारसरणीच्या मुळांशी कितीहि उच्च कळकळीचा सात्विक हेतू असला, तरी तिचा परिणाम विचारावर मुळींच न होतां तात्पुरत्या लोकप्रसिद्धीच्या हळदीसाठी धाधावलेल्या अल्लड तरुणांच्या विकारांवर मात्र होतो; आणि तो तसा झालाहि. प्रस्तुतचे द्वैत केवळ शब्दलालित्याच्या किंवा शांतिरस्तु, पुष्टीरस्तु आशीर्वादाच्या बळावर शमणारे नव्हे, ही जाणीव म. गांधींना होऊ नये हे आश्चर्य आहे. पण आश्चर्य तरी कसले? सत्वगुणी माणसाने या फंदांत आधी पडूंच नये. ते त्याचें कामच नव्हे. या त्रिगुणात्मक सृष्टीत सत्व, रज किंवा तम यापैकी कोणत्याही एकेका गुणाचा उच्च परिपोष अखेर अपजयीच होत असतो. त्रिगुणांचा समतोल समन्वय झालेल्या सत्तेला किंवा व्यक्तीलाच ही तिरंगी नाठाळ दुनिया वठणीवर आणून आपल्या काबूत ठेवता येतें. रेड्याला आणि वाघाला एकाच बादलीतले पाणी एकत्र प्यावयास भाग पाडणाऱ्या सर्कसवाल्याला सुद्धां तात्पुरत्या या त्रिगुण-समन्वयाची हुबेहूब नक्कल करावी लागते.
अभेदाचा भेद होऊ नये, पण झाला. हिंदुचे मुसलमान होऊन, धर्म-भेदाच्या विरळ भेदानें एकाच रक्तमासांच्या भावंडांत द्वैत उत्पन्न होऊ नये, पण झालें. त्याला कारणे कांहीहि असोत. [ती मूळग्रंथांत दिलेली आहेत.] त्यांची शाब्दिक मीमांसा द्वैत निर्मूलनास फारशी उपयोगी पडणार नाहींत. हिंदु आणि मुसलमान हा भेद नाहींसा झाला पाहिजे, एवढा हेतू ठाम ठरल्यावर, तो कसा साध्य करता येईल? सगळ्याच क्षेत्रांत शक्य नसेल, तर कोणत्या? याचें निर्दय निस्पृहतेनें विवेचन करणे आतां प्राप्त आहे. धर्म, सामाजिक जीवन, नैतिक विकास, राजकीय महत्त्वाकांक्षा आणि संस्कृति अशी अनेक क्षेत्रे आहेत. यांपैकीं कोणत्या क्षेत्रांत ही शेंडी-दाढीची गांठ बेमालूम मारता येईल, हे पहाणें आहे. खरें पाहिलें तर खटाशी भिडवावा खट, उद्धटाशीं व्हावें उद्धट या समर्थोक्तीचाच अखेर अवलंब केल्याशिवाय गत्यंतर नाहीं, हें जरी स्पष्ट आहे, तरी निर्वाणीची ही वेळ येण्यापूर्वी त्वयार्ध मयार्धच्या कांहीं पायऱ्या ओलांडल्या तर दोनहि पक्षांच्या माणुसकीला तें विशेष शोभून दिसेल खास, अनेक क्षेत्रांपैकी राजकीय क्षेत्रांत हिंदु-मुसलमानांची एकी नसणेंच शक्य नाहीं.
दोघांचेहि बापजादे पूर्वी चक्रवर्ति असले, तरी आज दोनहि समाज ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीच्या उकळत्या हंड्यांत बटाट्याप्रमाणे शिजविले जात आहेत. तात्पुरत्या राजकारणी डांवपेंचांच्या सिद्धीसाठीं कांहीं विशिष्ट हक्कांच्या सवलतीची एखादी ओंझळ मुसलमानांच्या झोळीत पडली काय, किंवा हिंदुंच्या चौपदरींत पडली काय, सुपांत असणाऱ्यांनी हासायला नको व आधणांत पडलेल्यांनी रडायला नको, अशी वास्तविक स्थिती आहे. सुपांतल्यांनाही अखेर आधणाचीच वाट धरावयाची असते, हें विसरतां येत नाहीं. विशेषतः, मुसलमान समाज आंगमस्तीच्या कामांत कितीहि दांडगा असला, तरी राजकारणी क्षेत्रांत ज्या बुद्धिमत्तेची आवश्यकता विशेष, त्या बुद्धिसामर्थ्यासाठी तरी निदान त्यांना हिंदुंच्या गळ्याला मिठ्या मारणे भाग आहे.
आतां, धार्मिकदृष्ट्या हिंदु-मुसलमानांची एकी होणें शक्य आहे काय? या प्रश्नाचा विचार करू. धर्माविषयीं बोलतांना त्यांतल्या गूढ उदात्त तत्त्वांकडे पहा, त्यांतलें मूलभूत तत्त्व एकच आहे. `राम रहिम सब एकहि है` इत्यादि मुद्दे बरेच लोक एकीच्या मंडनार्थ पुढें आणतात. देव एक आहे. हा सिद्धांत सर्व धर्मपंथांत सामान्यत्वें सारखाच मान्य आहे. परंतु तेवढ्यावरून त्या सर्वांची सर्वच बाबतीत एकवाक्यता अझूनपर्यंत तरी घडून आलेली नाहीं. याला अपवादच हुडकून काढावयाचे असतील तर ते तत्त्वज्ञानाच्या परमोच्च स्थितीला पोहचलेल्या हिंदु-मुसलमान संतांत मात्र आढळतात; इतरत्र नाहीं. पण तत्त्वज्ञानाच्या या परमोच्च वातावरणांत हिंदु हा मुसलमान बनत नसून, मुसलमान मात्र अंतर्बाह्य पक्का हिंदु बनत असतो, हें अवश्य लक्षांत घेतले पाहिजे.
सर्वसामान्य जनतेच्या धर्मकल्पना अगदीच अस्पष्ट व भ्रष्ट असतात. शिवाय, विशिष्ट धर्मपंथानुकरण त्या त्या धर्मांतल्या मूलभूत तत्त्वप्रत्ययापेक्षां ऐहिक लाभांची आशा, कांही तरी सुटसुटीत सवलती, किंवा शुद्ध बळजबरी यांवरच आजपर्यंत घडून आलेले आहे. ज्या इस्लाम धर्माचा प्रसारच मुळी रक्तबंबाळ नागव्या तलवारीच्या जोरावर खुद्द धर्मोत्पादक महंमदानेंच करण्याचा पाया घातला, त्या धर्माची तात्त्विकदृष्ट्या हिंदुधर्माशी एकवाक्यता घालण्याचा यत्न करणे म्हणजे विळ्या भोपळ्याचे गांठोडे बांधण्यासारखेंच आहे. तत्त्वज्ञानापेक्षा तलवारीच्या जोरावरच ज्या धर्माचा मिशनरी बाणा सर्व हिंदुस्थानभर बेसुमार बोकाळला; त्या धर्माच्या आसुरी स्वरूपावर तात्त्विक एकवाक्यतेचा सफेदा कितीहि चोपडला तरी व्यर्थ होणार यांत संशय नाहीं, नुसत्या तत्त्वज्ञानावरच जर महंमदाने भिस्त ठेवली असती, तर त्याला हिंदुधर्माने आमूलाग्र गिळून पचनी पाडलें असते.
बौद्ध धर्माच्या ऱ्हासानंतर हिंदु धर्मीयांनी आपला जन्मजात मिशनरी बाणा टाकल्यामुळे, त्यांना इस्लाम व क्रिस्ती धर्मपंथांपुढे बाह्यतः जरी हतवीर्य व्हावें लागले, तरी त्यांच्या सर्वस्पर्शी तत्त्वज्ञानानें, नकळतच का होईना, अखेर या दोनहि प्रतिस्पर्ध्यावर मात केल्याशिवाय सोडली नाहीं. असें झालें नसते तर आज पृथ्वीच्या पाठीवर एकहि हिंदु शिल्लक राहिला नसता. हिंदुंच्या टिकावाचे मर्म येथेंच आहे. मात्र ते॑ मर्म आतां अत्यंत जीर्ण व हतबल स्थितीला येऊन पोहचलें आहे. तत्त्वज्ञान कितीहि मिशनरी स्पिरिटचे असले, तरी अनुयायांमध्ये जर त्या स्पिरिटचा लवलेश नसेल, तर त्या तत्त्वज्ञानाचे आयुष्य संपलेच म्हणून समजावें.
हिंदुंनी आपल्या तत्त्वज्ञानाच्या मिशनरी स्पिरिटवर निष्क्रीय विश्वास टाकून, व्यवहारदाक्षिण्याला भडाग्नि दिल्यामुळेंच त्यांचा राष्ट्रीय अधःपात झाला आणि आता तर त्या सुप्रसिद्ध मिशनरी स्पिरिटचा खडखडाट उडाल्यामुळे त्यांच्या प्रत्यक्ष अस्तित्त्वाचीहि जबरदस्त शंका उत्पन्न झाली आहे. अशा अवस्थेत जुलूमजबरदस्तीची ख्याति असलेला मिशनरी इस्लाम धर्म आणि बेअक्कल भिक्षुकशाहीनें लेचापेचा केलेला शेंदाड हिंदु धर्म यांच्या एकीचा स्पष्ट दिसणारा मार्ग म्हटला म्हणजे एकजात सर्व हिंदुंनी मुसलमानी धर्माचा स्वीकार करून आपल्या नामर्दाइवर चतुरस्त्रेतेचें प्रसंगावधानी पांघरूण घालावें, नाहींतर तत्त्वज्ञानाच्या पुण्याईवर किंवा शिल्लक असलेल्या मनगटाच्या जोरावर सर्व मुसलमानांना हिंदु करून घ्यावे; यापेक्षां तिसरा मार्ग नाही.
हिंदुधर्माचा मूळचा मिशनरी बाणा आणि हिंदुसंस्कृतीचा सर्वसंग्रही याचकपणा आज जर कायम राहिला असता, तर हिंदु आणि मुसलमान या भेदाला इतके तीव्र स्वरूप खास आलें नसतें. आजचा मामला अर्थात् चमत्कारिक होऊन बसला आहे. इस्लामधर्म कट्टा सर्वसंग्रही आणि प्रचलित हिंदु धर्म ऊर्फ भिक्षुकशाही अधर्म कट्टा दुराग्रही, तुसडा, एकलकोंड्या आणि नामर्द. सर्वसंग्रही इस्लाम लोक मर्द, तर तुसडे अदूरदृष्टि हिंदु लोक नामर्द. कोठल्याहि क्षेत्रांतला कसलाहि विषय असो; राजकीय असो, सामाजिक असो, नैतिक असो, त्याला धार्मिक फतव्याच्या आणि खुतब्याच्या सबबीवर वाटेल तसे धोरणी वळण देणे मुसलमानांच्या हातचा मळ आहे.
हिंदुंना इहलोकीच्या व्यवहारांपेक्षा परलोकच्या झाडसारवणाची छातिफोड झुरणी लागलेली; त्यांना भिक्षुकशाही धर्माच्या क्षुद्र सोवळ्याओवळ्यापलीकडे, राजकारणाच्या किंवा समाजकारणाच्या क्षेत्रांत नजर टाकण्याची अक्कलय उरलेली नाहीं! एकाची धर्माची कल्पना व्यवहारचतुर व विश्वव्यापी, तर दुसऱ्याची व्यवहारशून्य व संकुचित; एक धिंगामस्तीच्या कामांत वाकबगार, तर दुसरा एक चपराक लगावली तर दुसरा गाल पुढे करणारा येशूचा अवतार. इहलोकींच स्वर्गसुख भोगण्याची मुसलमानांची प्रतिज्ञा, तर स्वर्गसुखासाठी परलोकी झटपट मरून जाण्याची हिंदु धर्माची भिक्षुकी आज्ञा. असे हे दक्षिणोत्तर प्रवृत्तीचे दोन समाज धार्मिक क्षेत्रांत परमोच्च सात्त्विक भावनेनें समरस होणे कितपत शक्य आहे, याचा वाचकांनी विचारच करावा. सारांश, सध्यां ज्या फंद फिसाटांवर हिंदी मुसलमानबांधव, स्वतःच्या नसांत नित्य खेळणाऱ्या रक्ताची ओळख विसरून, खिलाफतीसारख्या भाडोत्री धर्मकल्पनांनी स्वतःस हिंदु समाजापासून अलग मानण्याचा आत्मघात करीत आहेत. त्याचा योग्य विचार केल्यास, हिंदु समाजालाहि तुल्यबली बनल्याशिवाय हा कृत्रिम भेदाचा भयंकर भरकटलेला वाद ताळ्यावर येणें शक्य नाही.
बाहेर दिसणाऱ्या भेदाचे स्वरूप हेंच काय ते खरे स्वरूप अशा कल्पनेची मनावर छाप बसूं दिली, तर प्रस्तुत वादाची चिकित्सा नीट होणार नाही आणि त्याचें निराकरणहि करता येणार नाहीं. त्यासाठी आपल्याला अंतरंगांतच प्रवेश केला पाहिजे. अखिल हिंदुस्थानांतल्या भिन्न भिन्न संस्कृतींच्या मुसलमान समाजांना वगळून, आपण खुद्द महाराष्ट्रांतल्याच मुसलमान बांधवांच्या सामाजिक, धार्मिक व सर्वसामान्य समजुतींचे परीक्षण केल्यास नामभेदाशिवाय व बाह्यांग-भेदाशिवाय हिंदुब्रुवांत आणि मुसलमान-ब्रुवांत वास्तविक कसलाच भेद दिसून येणार नाहीं.
राजकीय सत्तेच्या बळानें पूर्वीच्या अस्सल हिंदुंवर झालेल्या इस्लामी जुलूम जबरदस्तीच्या धर्मांतरांतूनच हिंदुस्थानांतला अखिल मुसलमान समाज निर्माण झालेला आहे. जबरदस्ती किंवा लांचलुचपतीने धर्मांतर झाले म्हणजे माणसाची संस्कृती, प्रकृती, भावना किंवा हजारों वर्षे वंशपरंपरेनें रक्तातून उत्क्रांत किंवा अपक्रांत होत आलेली ईश्वरविषयक बरीवाईट कल्पना तत्काळ समूळ नष्ट होत नाहीं. याचें प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे आमचा महाराष्ट्रांतला मुसलमान समाज त्यांतील व्यक्तिमात्रांची नांवें व पेहराव बदलले तर अस्सल हिंदुंत आणि त्यांच्यात कसलाहि भेद दिसून येणार नाही. एवढा मोठा कडवा एकेश्वरी इस्लाम धर्म, पण आज दोन अडीच शतकांच्या अवधींत सुद्धां त्याला आमच्या या धर्मांतरित मुसलमान बांधवांच्या धार्मिक समजुतीत बाह्य सोंगाच्या बतावणीपेक्षां मुळींच कांहीं फरक घडवून आणता आलेला नाही, ही गोष्ट विचार करण्यासारखीच आहे.
धर्माच्या सबबीवर महाराष्ट्रांत कांहीं तुरळक ठिकाणी जे हिंदु मुसलमानांचे दंगे अलीकडे झाले आहेत, त्यांच्या चिथावणीची मूळ कारणे किंवा मुसलमानांनी वादार्थ पुढे केलेली कारणे, यांचे पृथककरण केले, तर कोणत्याहि विवेकी व विचारी हिंदु मुसलमानाला असे प्रांजलपणे कबूल करावे लागेल की ही कारणे प्राणघातक दंग्याशिवाय सुद्धा आपापसांत मिटवितां येणें शक्य होते. हिंदुंच्या धर्माचा प्राण भजनी टाळांत किंवा वाजंत्र्यांच्या सणईत अडकलेला नाही, किंवा `न तस्य प्रतिमा अस्ति` अशा निराकार, निर्गुण व स्थिरचरव्यापी अल्लाच्या प्रार्थनेचा व्याप विशिष्ट मशिदीच्या चार भिंतींत कोंबलेला नाहीं, हें तत्त्व प्रत्येक विचारवंत धार्मिकाला कबूल केल्याशिवाय सुटका नाहीं, गोवधाच्या बाबतीत प्रत्यक्ष कुराणाचीच आज्ञा, हिंदुंच्या पौराणिक निषेधापेक्षां, मुसलमानांची कानउघाडणी करण्याइतकी सर्वसमर्थ आहे खास.
अर्थात् आजपर्यंतच्या दंग्यांत `दंगा केलाच पाहिजे` या माथेफिरू हुल्लडीपेक्षा दुसरे विशेष आदरणीय `धार्मिक` तत्त्व सांपडणे कठीण आहे. इतकेंच नव्हे तर दंग्यांत सामील झालेल्या शेंकडों अविचारी उनाडटप्पूंना आपण दंग्यांत सामील कां झालों याचे कारण `सब लोग बहार निकले, मैभी बहार पडा` याशिवाय अधिक देता आले नाही. आधीच मुसलमान समाज मनस्वी अशिक्षित, त्यांत विकृत धर्मकल्पनेचा मनावर पगडा बसल्यामुळे, आधीच उल्हास त्यांत फाल्गुनमास या न्यायाने, त्यांच्या आडदांडपणाला चारंवार उकळी फुटते. बरें, आजला मुसलमान समाजांत जे कांहीं थोडे विद्यालंकृत विवेकी लोक स्पृहणीय कर्तबगारीनें पुढे आले आहेत. त्यांचा आपल्या धर्मबांधवांवर असावा तितका वचक किंवा आदर नाहीं.
अल्लीबंधूंसारखे जे कोणी विद्यासंपन्न व प्रतिभासंपन्न कांही तुरळक विद्वान आहेत, ते आपल्या विवेकहीन धर्मवेड्या समाजबांधवांत व्यापक विचारांचा फैलाव करण्याऐवजी स्वतःच शिंगे मोडून वासरांत घुसतात आणि स्वतःची मानमान्यता कायम राखण्यासाठी कुराणप्रियतेचे थेर माजवितात. सारांश, ज्या उन्नत विचारांनी चिकित्सापूर्ण विवेकवादाचा आज सर्व जगभर फैलावा केला आहे व ज्यामुळे निरनिराळ्या धर्मपंथांतील सर्वसामान्य तत्त्वांचे एकीकरण करण्याची प्रवृत्ति आज उत्पन्न झालेली आहे, त्या विचारांचा लवलेशही या विद्यालंकृत इस्लामी पंडितांना मानवू नये, यांत अज्ञानापेक्षां कांही तरी विशेष गूढ डावपेचांचें पाणी मुरत आहे, असें उघडच होतें.
प्रत्येक कृतीला धर्माची मान्यता शोधण्यांत मौलवी लोक मोठे हुषार. धर्माज्ञा सांपडली नाही की ते सत्यालाहि पाठमोरे व्हायला दिक्कत बाळगीत नाहीत. २० व्या शतकांत एखादी गोष्ट मनाला पटली, पण त्याचा पुरस्कार करणारी धर्माज्ञा जर ७ व्या शतकांतल्या कुराणांत नसली, तर चांगले शहाणे-सुर्ते विद्वान मौलवी व पुढारी त्या गोष्टीचा धि:कार करण्यात महापुण्य समजतात. उदाहरणार्थ, स्त्रियांच्या उन्नतीचा प्रश्न आज सर्वत्र प्रामुख्याने पुढे आला आहे. खुद्द हिंदुस्थानांत कांहीं विवेकसंपन्न मुसलमान भगिनी विद्यालंकृत होऊन देशसेवेसाठी पुढे आलेल्या आहेत. अल्लीबंधूंच्या पूज्य व वृद्ध मातोश्रींची देशाभिमानाची उत्कट तळमळ आज त्रिलोकविश्रुत झाली आहे. त्यांची लक्षावधि मुसलमानांपुढे उदात्त विचारांची अनेक व्याख्याने झाली. परंतु ७ व्या शतकाच्या सांच्यांत २० व्या शतकाची दुनिया कोंबण्यांतच धर्मरहस्य पहाणाऱ्या मौलवींनी नुकताच एक `फतवा` जाहीर केला आहे की स्त्रियांची व्याख्यानें ऐकूं नयेत अशी महंमद पैगंबराची धर्माज्ञा आहे!
अर्थात् यापुढे धर्मशील अल्लीबंधूंच्या देशाभिमानी मातोश्रीचीं व्याख्याने बंदच पडली पाहिजेत, हें सांगणे नकोच, तेराशें वर्षांपूर्वी एखाद्या विशिष्ट धर्मप्रवर्तकानें प्रोक्त केलेल्या अनुशासनाची तेराशें वर्षांनंतर आजसुद्धा अक्षरश: अंमलबजावणी करण्याचा आग्रह म्हणजे गतानुगतिक जीर्णमतवादाचा कळस होय.
क्षेत्र सामाजिक असो, राजकीय असो किंवा कसलेंहि असो, त्याला धार्मिक स्वरूप देण्याची वहिवाट खुद्द महंमद पैगंबरानेंच पाडलेली, मग मोपल्यांचे अत्याचार, मालेगांवचे खून, मुलतानचा निर्लज्ज धुमाकूळ किंवा गांधींच्या नॉन्कोऑपरेशनची खिलाफतशाही यांचा जो खेळखंडोबा मातला, त्यालाहि धर्माचा भरभक्कम पाया कां असूं नये? मुसलमानांनी अशा प्रकारे सगळ्याच बाबतींत धर्माची फोडणी घालण्याचा परिपाठ ठेवला, म्हणून त्या फोडणीचें वर्म आतां कोणास उमजत नाहीं, असें थोडेंच आहे? असा हा धर्म जरी विश्वव्यापी विशाळ असला, तरी त्याचा प्रसार जुलुमजबरदस्तीच्या `सोज्वळ व सात्विक` साधनांनीच अव्वल अखेर होत असल्यामुळे, त्या धर्माचें वारें अनुयायांच्या आंगच्या कातडीच्या आंत घुसलेंच नाहीं, तर त्यांत कोणी चकित व्हायला नको.
हिंदुस्तानांतले ५ कोटी मुसलमान हिंदुंचे मुसलमान बनलेले आहेत. ही इतिहाससिद्ध गोष्ट धर्माचे कितीही जरतारी पांघरूण घातले तरी लपणे शक्य नाही. महाराष्ट्रांतल्या मुसलमानांची दिनचर्या पाहिली तर त्यांचा भाडोत्री किंवा बळजबरीचा धर्म अजून वरवरच तरंगत असलेला दिसतो. कातडीच्या आंत तो घुसलाच नाहीं तर अंतःकरणांत कसला भिनतो? त्यांचे हिंदु देवदेवतांचे नवस अजून सुटत नाहीत. आंगावर देवी आल्या की शितळादेवीची प्रार्थना सुरू होते.
गांवच्या देवाचा आणि शिवेवरच्या म्हसोबाचा वर्षासनाचा वचक अजून आहे तसाच आहे. कित्येकांच्या घरचे पूर्वापार कुळस्वामींचे टाक अजूनहि भक्तिभावानें पूजले जात आहेत. साधारणतः पुरुषवर्ग धार्मिक बाबतीत सडक सीताराम तेव्हांच बनतो; पण स्त्रियांच्या मनावर बिंबलेले बरेवाईट धर्मसंस्कार निघणे फार कठीण असतें. वेळी बापलेकांची पुरुषी परंपरा, ते दोघे पुरुषच असल्यामुळें, कोणत्याहि संस्काराचा सोक्षमोक्ष तेव्हांच करू शकतात; पण मायलेकींची व सूनसासवेची कल्पना-परंपरा गोषांतल्या गोषांत गुप्त रहात असल्यामुळें, बाह्य प्रदेशीं निर्गुण निराकार अल्लाचा पैगंबरी गाजावाजा केवढाहि दुमदुमला, तरी त्यांच्या जुन्या हिंदु धर्मसमजुती जशाच्या तशाच शिल्लक चालू आहेत.
नुसता लग्नविधि पाहिला तरी त्यांत देखील रूखवताच्या आणि उष्ट्या हळदीच्या मिरवणुकी चालूच आहेत. बरेचसे विधि हिंदु, नांवाला एकदोन इस्लामी, असा प्रकार या विषयावर एका उत्साही महाराष्ट्रीय मुसलमान बंधूशी एकदां आमचें संभाषण झाले. हे चांगले इंटरपर्यंत शिकलेले आहेत. मराठी भाषा उत्तम लिहितात व बोलतात. पण ते एका खिलाफत कमिटीचे सेक्रेटरी बनले होते. गांवांत लग्नसराईची धामधूम व मुसलमान भगिनी (करवल्या वाद्यांच्या थाटांत रूखवताची व आहेराची शिफ्तरे घेऊन मिरवत होत्या.
आम्ही म्हटले "काय हो साहेब, या सर्व तर आमच्या हिंदु लग्नाच्या पद्धति, तुम्हाला अजून कशा परवडतात?" यावर आमच्या मित्राने दिलेले उत्तर विचार करण्यासारखे आहे. "एकवेळ पुरुष पत्करले, पण या बायका परवडत नाहींत. हेंच प्रकार काय, आणखी शेकड़ों हिंदु रीतीरिवाज आमच्यात उघडमाथ्याने चालू आहेत. ठिकठिकाणच्या पंचायतींकडून ते बंद पाडण्याची आम्ही शिकस्त करीत आहोत. पण बंद होतीलसे दिसत नाही. What is bred in the bones, cannot go out of the flesh! (हाडांत वाजलेले कातडींतून काय कपाळ जाणार!)" सध्यां बोकाळलेला खिलाफतीचा आणि तुर्कस्थानाच्या भवितव्यतेचा प्रेमा आसेतुहिमाचल कितीहि भराऱ्या मारीत असला, तरी महाराष्ट्रीय मुसलमानांना खिलाफत ही चीज काय आहे आणि आमचे पुढारी कशाकरितां या उलट्या गोलांट्या मारण्यास आम्हांस सांगत आहेत, याचा नीटसा उलगडाच होत नाही. होईल कसा? तेथें जातींचे लागते!
आम्हीं तर असेंहि म्हणतों की महात्मा गांधींनीं खिलाफतीची तळी जर उचलली नसती, तर इस्लाम पुढाऱ्यांच्या नुसत्या फतव्या खुतब्यांनी तुर्कस्तानाविषयींचा बळजबरीचा `एककोट` ओरडायला महाराष्ट्रीय मुसलमानसमाज मुळींच तयार झाला नसता. आज वास्तविक ज्यांची स्थिती `न हिंदुर्नयवनः` अशी आहे. शिक्षणाचाहि ज्यांना फारसा गंध नाही, शिल्लक राहिलेल्या हिंदु संस्काराशिवाय पूर्वाश्रमीची ओळख पटविणारे विशेष काही साधन ज्यांजवळ उरले नाही. ज्यांना आपल्या नियुक्त पोटापाण्याच्या प्रश्नाबाहेर खुद्द महाराष्ट्राचीहि काही ठळक कल्पना नाही, त्यांना तुर्कस्थान आणि खिलाफतीचें अवचित अलोट प्रेम फुटणें कितपत सहजसिद्ध आहे, याचा त्यांनीच विचार करावा. पण धर्माच्या नांवाखाली वाटेल तें घडवून आणण्याची कला मुसलमानांच्या हातचा मळ होय.
हिंदुलोक तत्त्वज्ञानपारंगत असल्यामुळे ते नेहमी आकाशांत डोकें ठेवून अंतराळी चालत असतात. त्यांचे डोके जरी फोडलें तरी धर्म वरच्यावर कायम राहतो. मोठी अजब गोष्ट! खालीं पायाखाली कांहीहि पेटले तरी त्यांना त्याची परवा नाही. मोठी अजब गोष्ट!! चिपळूण लत्त्याची शाळेंत जाणारी मुलें पाहिली तर हिंदु कोण आणि मुसलमान कोण, हें ओळखण्याची पंचाईत पडते. आडनांवें सुद्धां अजून जोशी, साठे, चितळे आणि बापटच! पण त्यांना हिंदुधर्मात परत घेण्याची बुद्धि होत आहे का कोणाला? पहिल्या शाहू छत्रपतीबरोबर त्यांच्या तैनातींतली शेंकडो मराठे मंडळी दिल्लीहून साताऱ्यास परत आली. शाहुमहाराज राजकारणाच्या जोरावर छत्रपति बनले; पण या मराठे मंडळींना कसल्या तरी कांही तरी लौकिकी प्रायश्चित्तानें पावन करून घेण्याची खटपट कोणीच न केल्यामुळे त्यांची एक निराळीच मुसलमानवजा जात आज खुद्द साताऱ्यास आढळते.
अशा रीतीनें शुद्ध हिंदु संस्कृतीच्या एका विस्तृत समाजाला हकनाहक एका परकी भिन्न संस्कृतीच्या भाडोत्री प्रेमासाठी धर्माभिमानाचें लटके नाटक नटविणें भाग पडत आहे. याची हिंदु धर्मीयांना लाज वाटली पाहिजे. आत्मा आपल्या आवडिनें धर्माचा स्वीकार करीत असतो. राजकीय उद्देश साधण्यासाठी धर्मांची बळजबरी बिनीला रवाना करण्यांत कितीहि धोरणी मुत्सद्देगिरी असली, तरी त्यामुळे तो बळजबरीचा धर्मविधि आत्म्याची तृष्णा भागवू शकत नाही किंवा त्यावर वंशपरंपरेने बसत आलेले नाना प्रकारचे संस्कार नष्ट करू शकत नाही. अर्थात् अशा बळजबरीचे तत्काळ निराकरण झाले नाहीं, तर त्या व्यक्तीच्या वा समाजाच्या हृदयात परस्पर विरुद्ध संस्कृतीचा संग्राम माजून रहातो, हे निराळें सांगणें नकोच.
एतद्देशीय मुसलमान बांधवांची संस्कृती हिंदु आहे. आज चार पांचशें वर्षांत ती संस्कृती लेशमात्र पुसली गेलेली नाहीं. संस्कृतीचा संस्कार म्हणजे अंगावरील धूळ नव्हे कीं ओला चिखल नव्हे, की तो रुमालानें पुसता येईल! बाह्य प्रदेशी विसंस्कृत धर्माभिमानाचें केवढेंहि प्रचंड तुफान भडकलें, तरी अंतःकरणावर उमटलेले मूळ संस्काराचे रंग त्यामुळे फिके पडत नाहीत किंवा धुतलेहि जात नाहीत. पूर्वपरंपरेला अनुसरूनच अयाचित व अनावश्यक तुर्की राजकारणाला महत्त्व देण्यासाठी खिलाफतीची जंगी चळवळ हिंदुस्थानांत झाली. तिच्या पाणीदार टोंकाला म. गांधींच्या अनत्याचारित्वाचे बोलघेवडे टोंपडें अडकवलें; तरीसुद्धां त्या चळवळीनें आपल्या राक्षसी रुधिरप्रियतेची व अमानुष अत्याचाराची भूक यथास्थित भागवून घेतली ती घेतलीच! या रुधिरप्रिय खुनशी चळवळीचा आणखी दूरवर विचार केला पाहिजे. हा शुद्ध भिन्न संस्कृतींचा संग्राम आहे.
बाह्यात्कारी धर्मानुयायी बनलेल्या परंतु संस्कृतिदृष्ट्या हिंदुच राहिलेल्या हिंदी मुसलमानांच्या अंतःकरणाचे रंग धुऊन पुसून काढण्याचा हा राजकारणी डावपेंच आहे. आधीच मनस्वी अशिक्षित असलेल्या हिंदी मुसलमानांच्या मनांत परकी तुर्की संस्कृतीच्या प्रेमाचा पाझर फोडून रक्तापेक्षा पाणी घट्ट असते हें सिद्ध करण्याचा अनाठायी उपद्व्याप आहे. याची सिद्धी कितपत होते हें आज स्पष्ट दिसत असले तरी भविष्यकाळ त्याचा पुरावा देण्यास खंबीर आहे. म. गांधींचे सात्विक महात्म्य महंमदापेक्षा किंवा येशू क्रिस्तापेक्षा कितीहि बरोबरीचे किंवा वरचढ असले, तरी हिंदी मुसलमानांचा राजकीय उद्धार तुर्कस्थानच्या भवितव्यतेच्या कपाळाला कपाळ घासून होणार नाहीं, हें तत्त्व त्यांना जितके लवकर पटेल तितकें बरें. हिंदी मुसलमान आणि तुर्की मुसलमान संस्कृतीनें तर पूर्वपश्चिमेइतके परस्परविरुद्ध आहेतच, पण राष्ट्रीय दृष्टीनेंसुद्धा एकमेकांचा सुहेर सुतकाचा संबंध नीटसा जुळून येणारा नव्हे.
एकधर्मीपणाच्या सरधोपट दोरीवर वाटेल त्या चळवळीच्या वावड्या आकाशांत कितीहि उंच भिरकवल्या तरी प्रत्यक्ष हिताचा प्रश्न आला की तुर्की तो तुर्की आणि हिंदी तो हिंदी या भेदाच्या कागदी भिंगऱ्या दोरीला चोपडलेल्या राजकारणी मांज्यानें फटाफट फाटल्या जातात. याची जाणीव हिंदी खिलाफतीष्टांना होईल तो सुदिन! एकधर्मीपणाच्या सबबीवर किंवा खिलाफतीच्या भिक्षुकशाहीवर हिंदी मुसलमानांच्या तिजोऱ्या कुंस्तुंतुनियाच्या अवाढव्य तिजोरींत मोहरांचा जर धबधबा पाडीत असतील, तर फुकटाफाकट आशीर्वादाचे शेंकडों फतवे निर्माण करून दात्यांच्या दातृत्वाचे दांत अधिकाधिक पाजळायला तुर्की जगद्गुरूला कसली अडचण आहे? परंतु या मोहरांच्या धबधब्यांनी हिंदी मुसलमानांच्या प्रचलित राष्ट्रीय अवस्थेची गुलामगिरी हापटून धोपटून पांढरीफेक धुतली जाईल आणि हिंदुपेक्षा त्यांच्या उन्नतीची कमान एकदोन अक्षांश रेखांश वर उचलली जाईल, अशी जर त्यांची अजूनहि समजूत असेल, तर ती फार भोळी समजूत आहे, असा इषारा त्यांना देणें आमचे पवित्र कर्तव्य आहे. तुर्की लोक आज स्वतंत्र आहेत. डार्डानेल्सवर जॉन बुल येऊन बसला किंवा खुद्द कॉन्स्टांटिनोपलवर इटलीच्या पोपाचा टोप गिरक्या मारू लागला, तरी ते आज स्वतंत्र व शस्त्रास्त्रसंपन्न आहेत.
आज ना उद्यां ते त्यांचा समाचार घेतील. पण हिंदी मुसलमान? उघडा उघड मूळचे ते हिंदुच. अर्थात् अखिल हिंदुसमाज ज्या गुलामगिरीच्या कढईत कढविला जात आहे. त्याच कढईंत त्यांचीहि अभेदभावाने बिरयाणी शिजत आहे. अशा स्थितीत हिंदी मुसलमान परकीय तुर्कीच्या तोंडाकडे पाहून आपल्या उन्नतीची आशा करीत असतील, तर वर्तमानकाळाने इषारा दिला आहे तरीसुद्धा भविष्यकाळ त्यांना `तुम्ही मोठी चूक केली` हेच उत्तर ठासून देणार आहे.
परकी परदेशस्थ स्वतंत्र राष्ट्रांच्या दाढीला कुरवाळून त्यांच्या सहानुभूतीने स्वतःच्या गुलामगिरीचे पाश तोडविण्याचा मोह अनैसर्गिक नाही. बुडत्यालाहि काडीचा मोठा आधार वाटतो. महायुद्धापूर्वी तुर्की आणि जर्मन राष्ट्रांबद्दल हिंदी लोकांना मोठा भरवसा वाटत असे; हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य-आशेची सर्व किरणे या दोन घेलाशेटी राष्ट्रांवर केंद्रीभूत झाली होती; आणि हिंदी गुलामांच्या तोंडाला सुटलेले पाणी अधिक गुळमट करून वाढविण्यांत त्यांनी कसलीहि कसूर केली नाही. सन १९०७-८ सालच्या बाँब प्रकरणाच्या धामधुमी असल्याच मृगजळावर भरारल्या होत्या. राजकीय अत्याचारांच्या जोरावर हिंदुस्थानाला स्वतंत्र करू पहाणाऱ्या हजारों देशभक्तांचे(?) बुद्धिमान प्रतिनिधी जर्मन आणि तुर्की फॉरीन ऑफिसात जेठा मारून बसले होते.
सानफ्रास्निस्को (अमेरिका) येथें सुप्रसिद्ध पंजाबी गुप्तकटवाला हरदयाळ यानें घदर पार्टी स्थापन करून गुप्तकट, खून, बंडें व अत्याचार यांना उत्तेजन देणारे जळजळीत वाङ्मय हिंदुस्थानांत गुप्त मार्गानें पाठविण्याचा धूमधडाका चालू ठेवला होता. इकडे महाराष्ट्रांत सावरकर बंधूंचा गुप्तकट नाशिकच्या पावन गोदावरीत आस्ते आस्ते हेंच कार्य करीत होता. सारें हिदुस्थान अत्याचारांनी पेटले होते. अखेर या मूर्खपणाचा व्हायचा तोच परिणाम होऊन, शेंकडों उमेदवार तरुण फांसावर गेले व हजारोंच्या जीविताची राखरांगोळी झाली. यांपैकी लाला हरदयाळ एम. ए. या तरुणाचा जर्मन व तुर्की राष्ट्रांबद्दलचा अनुभव प्रत्येक विचारी व विवेकी हिंदु मुसलमान व्यक्तीने मनन करण्यासारखा आहे.
महायुद्धाला तोंड लागतांच या अत्याचारी देशभक्तांच्या आशेची भरती अपरंपार उसळली. हरदयाळ १९१५ मध्ये सान फ्रांसिन्को सोडून मोठ्या आशेने जर्मनीत आला आणि फेब्रुवारी १९१५ पासून तों ऑक्टोबर १९१८ पर्यंत त्यानें जर्मनी व तुर्कस्थान यांची खरी वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहिली. डोंगर नेहमींच दुरून साजरे दिसत असतात; पण प्रत्यक्ष अनुभव अगदीच निराळा व निराशाजनक असतो. ४४ महिन्यांच्या अनुभवाने हरदयाळचे डोळे लख्ख उघडले आणि सन १९०७ मध्ये गुप्तकटाच्या बंडाळीवर इंग्रजांना हिंदुस्थानांतून हांकलून देण्याच्या वल्गना करणारा बोलघेवडा देशभक्त हरदयाळ अगदी उलट मनोवृत्तीचा विवेकी माणूस बनला! त्याने तत्काळ Forty four months in Germany and Turkey (जर्मनी व तुर्कस्थानांतील माझे ४४ महिने) या नांवाचे एक इंग्रजी पुस्तक लिहिले व तें P. S. King & Son Ltd., Orchard House, Westminster, या कंपनीने प्रसिद्ध केले. या उत्कृष्ट ग्रंथाकडे जावें तितकें कोणाचे लक्ष गेलें नाहीं; कारण सर्व हिंदु मुसलमान हिंदवासी म. गांधीच्या असहकारितेचे तुणतुणें वाजवून अवघ्या ९ महिन्यांत खादीच्या जोरावर स्वराज्याची गादी प्राप्त करून घेण्याच्या गडबडींत होते.
जर्मनी व तुर्की राष्ट्रांना वेळोवेळी हिंदुस्थानाचा पान्हा कां फुटत असे, त्या पान्ह्याला हिंदी अनार्किस्ट तरुण कसे फसले आणि या दोन राष्ट्रांची वास्तविक स्थिती, त्यांची संस्कृति, त्यांची राजकीय महत्वाकांक्षा आणि ती साधण्यासाठी अहर्निष चाललेले गुप्त डांवपेंच काय आहेत, यांचा खुलासा प्रत्यक्ष अनुभवाने लाला हरदयाळ याने या बोधप्रद ग्रंथांत केला आहे. या पुस्तकांत जे लिहिलें आहे तें "मी स्वतःच्या खास अनुभवाने लिहीत आहे. ग्रंथांचे किंवा वृत्तपत्रांचे उतारे देण्याची मला जरूर नाहीं. स्वतःच्या डोळ्यांनी मी जें पाहिले व स्वतःच्या कानांनी मी जें ऐकलें, तेंच मी येथे नमूद करीत आहे" असा हरदयाळने प्रस्ताव केला आहे.
शेंकडों भिकारड्या इंग्रेजी नवलकथांची मराठी भाषांतरे करण्यांत आमचा दखनी लेखकवर्ग गुंतलेला असतो. त्यांपैकी एखाद्यानें हरदयाळच्या या ग्रंथाचे मराठी भाषांतर करून छापलें असतें तर हिंदुपेक्षा आमच्या महाराष्ट्रीय मुसलमान भाईंची व्यर्थ दिशाभूल झाली नसती खास. असो जर्मनीबद्दल हरदयाळ म्हणतो की, "जर्मनांची बुद्धिमत्ता २० व्या शतकाला शोभेशी आहे खरी, पण सामाजिक व राजकीय दृष्ट्या ते अजून मध्ययुगांतच आहेत." तुर्की आणि तुर्कस्थान यांविषयी त्याची मतें हिंदुस्थानांतल्या प्रत्येक विचारशील मुसलमानानें निदान आतां तरी विचारांत घेणें जरूर आहे. खालीं दिलेले विचार लाला हरदयाळचे आहेत. त्यांत आमच्या पदरचें कांही नाहीं. हे सर्वांनी नीट लक्षांत घ्यावें. हरदयाळ म्हणतो :-
(१) राष्ट्रदृष्टीनें अखिल इस्लामी जगाचा पुढारपणा घेण्यास तुर्की लोक अझिबात नालायक आहेत. संस्कृति व राजकीय कर्तबगारी यांचा गंधसुद्धां त्यांना नाहीं. ज्या वेळीं तुर्कांच्या हातीं खिलाफतीची सत्ता गेली. त्याच वेळीं इस्लामी जगाचें दुर्दैव ओढवलें. तुर्कलोक बेअक्कल आहेत, यांत मुळींच शंका नाहीं. ते चांगले लढवय्ये आहेत; पण राज्यकारभार चालविणे किंवा त्याची घटना करणे हे त्यांना मुळीच अवगत नाही. कित्येक शतकेपर्यंत ते अफाट प्रदेशाचे स्वामी आहेत; पण इतक्या अवधीत नांव घेण्यासारखें वाङ्मयसुद्धा त्यांना निर्माण करता आलेले नाही.
(२) तुर्कांना गायनविद्या किंवा तर्कशक्ति यांचाहि गंध नाहीं; याचें कारण मानसिक उत्क्रांतीत ते अगदीच खालावलेले आहेत. त्यांनी ग्रीसवरहि राज्य केलें. पण आपल्या ग्रीक प्रजेपासून ते कांहीहि नवीन शिकूं शकले नाहींत. खरें म्हटलें तर ग्रीक भाषा म्हणजे उच्च ज्ञान व उच्च संस्कृति यांची गुरुकिल्ली; पण ती या बेट्यांना काय होय? [पृ ३२]
(३) इतिहासानें हडसून खढसून सिद्ध केलें आहे कीं, तुर्की लोकांना बुद्धीचे आकलन करण्याची बीजरूप शक्तीच नाहीं. त्यामुळें ते कसल्याहि प्रकारच्या पुढारपणाला सर्वतोपरी नालायक ठरले आहेत. कारण पुढाऱ्यांचे पुढारपण बौद्धिक श्रेष्ठताच सिद्ध करीत असते; आणि तुर्कांत तर तिचा खडखडाट! अर्थात् इजिप्शियन्स किंवा इंडिअन्स (हिंदी) लोकांसारख्या सुसंस्कृत लोकांनी या तुर्क लोकांच्या पुढारपणाच्या नादाला लागावें तरी कसें? तुर्क हा नालायक नेता आहे. त्याला त्याचा इलाज नाहीं; कारण तो जात्या मानसिक दृष्ट्याच मुळीं अवनत आहे. तुर्कांविषयीं एक इजिप्शिन गृहस्थ मला म्हणाले "या तुर्कांना दोनच गोष्टी अवगत आहेत. एक लढाया आणि दुसरी मशिदी." [पृ ३३]
(४) तुर्कांची राजसत्ता भयंकर अनीति, जुलूम जबरदस्ती आणि घाशीरामी यांचे मूर्तिमंत चित्र होय. मुसलमान प्रजा असलेल्या देशावरीलच तुर्की राज्यकारभाराविषयीं मी हे लिहित आहे. ऐदीपणा व आंगसुस्ती हीं तुर्काधिपतीचीं मुख्य धोरणे व लक्षणे. एवढें छोटेखानी सीरिया, पण तेथेंहि यांना नीट राज्य करतां आलें नाहीं; आणि हे तुर्क लोक म्हणे इतर इस्लाम देशांना स्वयंशास्ते बनविण्यास मदत करणार! बर्लिन येथील एका इस्लाम वैद्याला मी एकदां सहज विचारलें कीं "कायहो, सीरियांत हा असला सांवळागोंधळ कां? तुर्की सरकारला चांगली खंबीर पोलिसांची सेना तेथें ठेवतां येत नाहीं काय?" त्यानें उत्तर दिले "होय. पण जेथें पोलिस खात्याचा वरिष्ठ अधिकारीच चोर लुटारूंचा साथिदार, तेथें काय व्यवस्था राहणार?" [पू. ३३-३४]
(५) तुर्क लोक हे जात्याच रानटी असल्यामुळें, त्यांच्या नशिबाशीं आपल्या दैवाचें संगनमत करण्यांत इजिप्ती व हिंदी मुसलमान मोठी घोडचूक करीत आहेत. शांतिप्रिय आर्मेनियन व ग्रीक लोकांच्या सर्रास कत्तली करणें आणि खुद्द पोलिस अधिकाऱ्यांच्या खास परवानगीनें शेंकडो ग्रीक अबलांचे पातिव्रत्य भ्रष्ट करणें यासारखीं राक्षसी व नीच मनोवृत्तीची दुष्कृत्यें तुर्कांनी किती तरी वेळां केल्याचे दाखले आहेत. इस्लाम धर्म म्हणतात तो जर हाच असेल, तर माझ्या ७ कोट हिंदी मुसलमान भाईंच्या धर्माबद्दल मला अतिशय लज्जित होणें प्राप्त आहे. असल्या या अर्धवट रानटी तुर्कांच्या नादी लागल्यामुळें इजिप्ती व हिंदी मुसलमान लोकांविषयी पाश्चिमात्य जगाची सहानुभूती पुष्कळच कमी झालेली आहे. ...
सुसंस्कृत जगाच्या कारभारांत आपल्या हिंदु देशबांधवांच्या हातांत हात घालून जर हिंदी मुसलमान भाईंना पडावयाचें असेल तर आधीं त्यांनी या तुर्की लफड्यांतून आपलें अंग पूर्णपणे काढून घेतले पाहिजे. कत्तली व जुलुमजबरदस्ती यांच्या जोरावर राज्य करण्याची तुर्की पद्धत विवेकी तर नाहीच नाही, पण तिला इस्लामीसुद्धा म्हणता येणार नाहीं. चेंगीझखान व हलाकु यांना शोभण्यासारखी ती एक शुद्ध गाळीव रानटी प्रवृत्ति आहे. हें लोक सुवेझच्या पूर्वेला राहतात व इस्लाम धर्म(?) पाळतात, एवढ्याच सबबीवर या खुनशी लोकांशीं आम्ही संगनमत करणें केव्हांहि श्रेयस्कर होणार नाहीं. इजिप्ती आणि हिंदी मुसलमानांनी आपली खरीखुरी स्थिती नीट ओळखून, या मध्य आशियाच्या लुटारूंशी कसलाही संबंध ठेवतां कामा नये. [पृ. ३५]
(६) `पॅन-इस्लामीझम` (जगातले सगळे मुसलमान एक ही भावना) म्हणजे गेल्या शतकांतला एक मोठा विचित्र व चमत्कारिक फार्स आहे. याचा अर्थ काय? तर एवढाच की इतर मुसलमानी राष्ट्रांनी तुर्कांचे स्तुतिपाठ गावे, त्यांची वरिष्ठ सत्ता मान्य करावी आणि प्रत्येक मुसलमानी राष्ट्रातल्या कांही थोड्या धाडसी व दांभिक लोकांनी तुर्की सरकारचा दरमहा १० ते ५० पौंडांचा मलीदा खाऊन इस्तंबूलमध्ये भटकत असावें... तुर्क कट्टे जात्याभिमानी आहेत. ते स्वजातियांशिवाय इतरांची केव्हांहि पर्वा न करणारे आहेत. जावा ते सेनेगालपर्यंत पसरलेल्या कोट्यवधि मुसलमानांच्या भानगडींत व नशीबाच्या सहाऱ्यांत त्यांना कसलीहि कळकळ वाटत नाहीं. आपण इस्लामी धर्माचे नेते, पवित्र मंदिराचे संरक्षक आणि खिलाफतीचे वारसदार आहोंत, असें इस्लामी जगाला भासवून त्यांची सहानुभूती आणि खिशातला पैसा उपटण्याची त्यांची खटपट असते. दरमहा कांही थोड्या पौंडांचा खुराक चारून, त्यांनी कित्येक इजिप्ती, अलजीरी, टूनिशी, सुदानी आणि इतर देशांतील मुसलमानी स्तुतिपाठकांना हाताशी धरलें आहे आणि तुर्कस्थान व तरुण तुर्क पार्टीच्या बोलबाल्याचा पॅनइस्लामीझमच्या सबबीवर सर्वत्र प्रसार करण्याचे काम चालविलें आहे. परंतु कोणत्याहि सामान्य कार्याकरिता आजपर्यंत यांनी काय स्वार्थत्याग केलेला आहे?
तुर्कांना इस्लाम धर्माचे पुढारी मानून त्यांच्यावर आपल्या सहानुभूतीची उधळपट्टी करण्यापूर्वी, आपण भलत्याच खोट्या फिसाटाच्या मार्गे लागलो आहोत, याची इजिप्ती आणि हिंदी मुसलमानांनी जाणीव ठेवावी. गेल्या बाल्कन युद्धाच्या वेळी हिंदी लोकांनी पाठविलेले लाखों रुपये आपल्या खिशांत ठेवायला तुर्कांना कांही जड वाटलें नाही; आणि त्याचा मोबदला त्यांनी काय पाठविलें? तर एक साधीच परंतु पवित्र सतरंजी आणि आभारदर्शक संदेश. याला खर्च तो किती येणार?
आज लक्षावधि मुसलमान मजूर या हिंदुस्थानांत उपासमार भोगीत आहेत. त्यांना या लाखों रुपयांच्या देणगीनें केवढी बरें मदत झाली असती? पण तेवढें कांही या देणगीवाल्यांना सुचलें नाहीं. प्रथम आपले घर सुधारलें पाहिजे, ही गोष्ट विसरतां कामा नये. परंतु स्वदेशांतल्या स्वधर्मीयांच्या अडीअडचणींकडे दुर्लक्ष करणे, पण हिंदुस्थानाबाहेरील वाटेल त्या फिसाटाबद्दल जीव टाकणे म्हणजे कित्येक मुसलमानांना ही एक फॅशनच वाटते. पॅनइस्लामीझमच्या ढोंगधत्तुऱ्याचा हा परिणाम आहे. मी अगदी या प्रकरणाच्या मुळाशी राहून तपास केला, त्यावरून मी असे खात्रीने म्हणू शकतों की पॅनइस्लामीझम म्हणजे अंधश्रद्धाळू मुसलमानांना ठकविण्याचा शुद्ध ढोंगधत्तुरा व कपटी कावा आहे. [पृ. ३६-३८)
(७) हिंदुस्थान, इजिप्त, जावा आणि इराण येथील मुसलमानांनी, खिलाफतीच्या स्वप्नांत गुंग न रहातां, आपल्या स्वतःच्या देशांचे राजकारण व्यावहारीक, दक्षतेने ठाकठीक बसविण्याचा उपक्रम केला पाहिजे. इस्तंबूल म्हणजे घाण, मेलेली कुत्री आणि कारस्थानी लुच्चांचे केवळ आगर आहे. या बाबतीत दुरून मात्र डोंगर साजरे दिसतात. प्रत्येक मुसलमान राष्ट्राने आपापल्यापरी आपल्या राष्ट्राची पुनर्घटना केली पाहिजे; इतर स्वधर्मी राष्ट्रांशी खुशाल सहानुभूतीने वागावे. परंतु जगाच्या ज्या कोपऱ्यांत आपला जन्म झाला आहे, त्या मायदेशांतच प्रत्येक मुसलमान बांधवाचे कर्तव्यक्षेत्र आहे, हे कोणीहि विसरतां कामां नये. [पृ. ४९]
लाला हरदयाळच्या ग्रंथांतून असले अनेक स्पष्टोक्तीचे उतारे खच्चून भरले आहेत. वाचकांना शितावरून भाताची परीक्षा सहज करता येईल. आमच्या महाराष्ट्रीय मुसलमान बांधवांना वरील उतारे विचार-क्रांतिकारक वाटल्याशिवाय खास रहाणार नाहींत. जसें दिसतें किंवा भासतें तसें नसतें, म्हणूनच माणूस फसतें, या म्हणीची सूचना त्यांना देणे अवश्य आहे. शेवटी हरदयाळचा एकच उतारा खालीं देऊन आम्ही या मुद्याची रजा घेतो :-
(८) `जुनी शिस्त बदलते क्रमानें नवीन जागा द्याया` हें सनातन तत्त्व आहे. खिलाफतीचाहि एक (बोलबाल्याचा किंवा आवश्यकतेचा) काळ होता. इतिहासाचा ओघ कधी माघारी उलटत नसतो. काही विशिष्ट राजकीय घटनेंशी इस्लाम धर्माची सांगड बांधण्याचे दिवस आता गेले. क्रिस्ती शकाच्या विसाव्या शतकांत आपण आहोत; हें कांही आठवे शतक नव्हे! खिलाफत आणि जिहाद या मध्ययुगीन चिंध्यांचा मुसलमानांनी आता त्यागच केला पाहिजे. जगाच्या धांवत्या प्रागतिक ओघांत इस्लाम धर्मसुद्धा जाणार; कारण या ओघाला इस्लाम हिंदु किंवा बौद्ध यांची थोडीच पर्वा आहे? मुसलमानांनी आता अर्वाचीन बनण्याची व पाश्चात्य जगाच्या कल्पना व ध्येयें आंगी पचविण्याची शिकस्त केली पाहिजे. मानवतेच्या उत्क्रांतीच्या धुरीणपणाचा मान आज युरप व अमेरिकेला आहे; आरबस्थान, मेसापोटेमिया किंवा तिबेटचा नव्हे. भविष्यकाळाकरिता नवीन जग आणि नवीन स्वर्ग तयार होत आहे; मात्र तो जुन्यापुराण्या फाटक्या तुटक्या धर्मतत्त्वांवर किंवा मतांवर उभारला जाणार नाही.
अर्वाचीन विचारांचा परिपाक करण्याचा अग्रमान आता सुशिक्षित इस्लाम बांधवांनी घेतला पाहिजे. कित्येक शतकापूर्वी जे विधी किंवा मोक्षसाधनांचे मार्ग थोर आणि जागृत समजले जात असत, त्यांवर जगण्याचा काळ आता राहिलेला नाही. धर्मप्रचारक महात्मे येतात आणि जातात; (आजपर्यंत शेकडों आले आणि शेकडो गेले) परंतु सत्याचा व नीतीचा पाठलाग करणारी जनता प्रगतिपथानें धूम ठोकीत पुढे पुढे जातच आहे. माझ्या मुसलमान बांधवांनीहि चालू काळाशीं समगामी होऊन प्रगतीच्या मार्गावर पुढें सरसावले पाहिजे आणि भूतकालीन रक्तानें बरबटलेल्या किल्लीनें भविष्यकाळचे दरवाजे उघडण्याचा यत्न त्यांनी करता कामा नये.
या उपदेशांत नवयुगाचा दिव्य संदेश आहे. जीर्णमताच्या फाटक्या तुटक्या चिंध्या पांघरून सद्य:कालीन नवयुगांत कोणाचाहि धर्मसंसार किंवा राष्ट्रसंसार चालणार नाही. नागव्या तलवारीच्या धमकीवर धर्मप्रसार करण्याची मुत्सदेगिरी प्रतिपक्षाच्या भोळसट मनोवृत्तींमुळें एका काळीं कितीहि यशस्वी झालेली असली, तरी तीच युक्ती या विसाव्या शतकांत उपयोगांत आणतांच नागव्या तलवारीला नागव्या तलवारीचें प्रत्युत्तर मिळाल्याशिवाय खास रहाणार नाही. असें होऊ लागलें म्हणजे या परस्पर वैराला राक्षसी युद्धाचें स्वरूप येऊन, धर्माच्या उज्ज्वलपणाचाहि शेणसडा झाल्याविना कसा राहील?
अलीकडे खिलाफतीच्या भाडोत्री ढोंगामुळें अखिल मुसलमान समाजांत जें एक अत्याचाराचें घाणेरडें वारे वाहू लागलें आहे, त्याचा सरळ अर्थ एवढाच निघतो कीं ८ व्या शतकांतल्या साधनांनी ते २० व्या शतकात तसल्याच तामसी विजयाची अपेक्षा करीत आहेत. काळ बदलत असतो, मानवी जीवन व मानवी कल्पनाहि बदलत असतात आणि धांवत्या काळाबरोबरच धर्मकल्पनांचाहि खराखोटेपणा कसाला लागून त्याचा चुराडा उडत असतो, ही साधी तत्त्वें सुद्धा ते विचारांत न घेण्याइतके विवेकशून्य बनले आहेत.
धर्मप्रसारक महंमद पैगंबराने आपल्या पवित्र कुराण शरीफांत नीतीची कितीहि उदात्त तत्त्वें नमूद करून ठेवली असली, तरी मुख्य आक्षेप पुढें येतो तो हाच कीं ती तत्त्वे खुद्द पैगंबराने व त्याच्या अनुयायांनी प्रत्यक्ष आचरणांत कितीशी आणली? नुसत्या तत्त्वांचा चांगुलपणा व्यवहारांत प्रत्यक्ष घडणाऱ्या अत्याचारांची वकीली करण्यास कितपत टिकेल, याचा विचारवंत मुसलमान बांधवांनींच वास्तविक विचार केला पाहिजे. आमचे महाराष्ट्र भाषाभिमानी इस्लामबंधु श्रीयुत सिकंदर लाल आतार हे आतां इस्लाम धर्म नांवाचें एक त्रैमासिक संपादन करीत असतात. त्यांच्या हेतुंबद्दल त्यांचा गौरव करणे उचित आहे. जानेवारी १९२३ च्या अंकांत (पृ. २३) `कुराण शरीफांतील युद्धनीति` या मथळ्याखालीं ते खालीलप्रमाणें खुलासा करतात :-
"एका हातांत कुराण व दुसऱ्या हातांत तलवार घेऊन धर्माचा प्रसार करणे चांगलें, अशी नीती कुराणांत सांगितलेली नाही. मुसलमानांनी आपल्या धर्माचा प्रसार केला पाहिजे, असा उपदेश त्यांत केला आहे खरा, पण तो प्रसार तलवारीच्या जोरावर करण्यास सांगितलेला नसून तो उपदेशाच्या मार्गानेंच करण्याविषयीं त्यांत आज्ञा आहे. आणि तुमच्या मधून असा एक संघ निर्माण झाला पाहिजे की, त्यांनी(लोकांना) मंगलमय मार्गाकडे वळविलें पाहिजे. त्यांना सत्कर्मांच्या आज्ञा केल्या पाहिजेत व त्यांना अयोग्य(?) कृत्यांपासून परावृत्त केले पाहिजे. असे लोक संसारापासून अगदीं अलिप्त असे असले पाहिजेत (सुरहू आल् इमरान्, र.११)."
"परंतु धर्माच्या कामांत सक्ती करणें अगदी गैर आहे. `धर्माच्या कामांत सक्ती नाहीं. खरोखर चुकीच्या मार्गापासून परावृत्त करून सन्मार्गाला लावण्याकरिता धर्माचा अवतार झाला आहे.` (सुरहू बकरहू, र. ३४)
आणि जर तुमच्या प्रतिपालकानें अशी इच्छा केली असती, तर पृथ्वीमध्यें जे लोक रहात आहेत ते एकदमच सगळे एकाच पंथांत समाविष्ट झाले असते; तेव्हां जोपर्यंत(धर्म?) लोकांच्या विश्वासास पात्र झाला नाहीं, तोंपर्यंत तुम्ही सक्ती करून काय उपयोग?" (सुरहू युनुस, र. १०)
हे विचार तर ठीक आहेत; पण खुद्द पैगंबर व त्याचे अनुयायी यांचा धर्मप्रसारार्थ आटारेट्याचा आचार कसा काय झाला, याची साक्ष इतिहासावरून काय पटते? एका हातांत कुराण आणि दुसऱ्या हातांत तलवार` ही काय केवळ थट्टेची म्हण अस्तित्वांत आली आहे, असें तर श्री. आतार यांचे म्हणणे नाहीं ना? कुराण शरीफांत काय लाख गोष्टी असतील, नाही कोण म्हणतो? पण त्या जर स्वतः पैगंबरानेंच कधी मानल्या नाहीत, तर अनुयायांनी त्यांची पर्वा कां करावी? आणि त्यांच्या सात्विकपणावर इतरांनी तरी विश्वास का ठेवावा? इस्लामधर्मीयांनी तलवारीच्या धमकीवर व अमानुष अत्याचारांवरच हिंदुस्थानांत मुसलमान निर्माण केला. हें ऐतिहासिक सत्य आहे.
सात्विक वृत्ती आणि अनत्याचार या दोन गोष्टींचे इस्लाम धर्माला अगदी वावडे आहे. असे छातिठोंक विधान करण्यापुरता पुरावा वाटेल तितका आहे. जुन्या पुराण्या अंधाऱ्या युगांतल्या गोष्टी वादग्रस्त म्हणून सोडल्या, तरी चालू घडीला सुद्धां अत्याचारी इस्लाम धर्माची वृत्ती केवढी भयंकर बोकाळलेली आहे. हें श्री. आतारांसारख्या हिंदुसंघांतूनच निर्माण झालेल्या मुसलमान गृहस्थाला दिसतच नाहीं का? अलीकडे हरहमेश घडून येणारे दंगे सोडले आणि एकटें मोपल्यांचे बंड घेतलें, तरी इस्लामी अत्याचारानें लज्जित न होणारा मुसलमान (कुराण शरीफांतील पवित्र वाक्यांवर त्याचा विश्वास असेल तर!) मुसलमानच नव्हे! परंतु मोठ्या आश्चर्याची गोष्ट हीच की, मोपल्यांच्या किंवा इतर ठिकाणच्या अत्याचारी मुसलमान बंडखोरांचा निषेध करणारा एकही सच्चा पैगंबरभक्त अजून पुढे आलेला नाही किंवा खिलाफतसंघ, मुस्लीम लीगसारख्या जबाबदार संस्थानींही त्याविरुद्ध चुकून ब्र काढला नाही.
हिंदु मुसलमानांची ही एकी मोठी विलक्षण खरी!! पण जेथें हिंदु पुढारीच नामर्द, षंढ आणि बेशरम बनले आहेत, तेथें मुसलमान पुढाऱ्यांनी तरी माफीची तोंडवाफ हकनाहक कां दवडावी? शिवाय मोपल्यांचे अत्याचार त्यांनी `केवळ धर्माभिमानासाठीच केले.` असें खुद्द महात्मा गांधींचेच त्यांना सर्टिफिकीट! मग काय विचारता?
मोपल्यांचे बंड असहकारवादाने व खिलाफतीच्या चळवळीमुळेंच उत्पन्न झालें, ही गोष्ट आतां हडसून खडसून सिद्ध झाली आहे. या बाबतींत मुसलमान लोक जितके जबाबदार आहेत, त्यापेक्षा अधिक जबाबदार गांधी व अल्लीबंधू आहेत. या बंडांतले अत्याचार इतके घाणेरड्या व मनःसंतापकारक रीतीचे आहेत कीं, त्यांना कोणतें विशेषण लावावे, याची मोठी पंचाईत पडते. फार खेदाची गोष्ट की मलबारांत अमानुष अत्याचारांचा सारखा धुमधडाका उडाला असतांही, महाराष्ट्रांतले सर्व `राष्ट्रीय` पत्रकार अगदी मूग गिळून बसले होते. इतकेंच नव्हे तर, मलबारांत आल्बेल आहे. बंडाच्या कंड्या असहकारद्वेष्टे उगाच उठवीत आहेत, अत्याचाराच्या हकिकती निव्वळ गप्पा आहेत. अशा प्रकारच्या भुलभुलावणीने या हरामखोर निर्लज्ज राष्ट्रीय पत्रकारांनी लोकांची दिशाभूल केल्याचे अत्यंत निंद्य पातक केलें आहे.
पंजाबच्या कत्तलीवर कमिशन बसवून, तेथल्या अत्याचारांच्या लहानमोठ्या सर्व हकिकती रिपोर्टद्वारे प्रसिद्ध करणारी या असहकारवादी राष्ट्रीयांची निस्पृहता, मलबारच्या मुसलमानी अत्याचारांची चौकशी करण्याच्या कांमी कां ठार मेली? सार्वजनिक हिताच्या कळकळीचा असला नामर्द देखावा फक्त हिंदुस्थानाखेरीज जगांत इतरत्र दिसणें शक्य नाही. वाचकांसाठी मोपल्यांच्या अत्याचारांचे अल्पस्वल्प चित्र रेखाटणारे कांहीं उतारे खाली दिले आहेत. त्यांवरून मलबारच्या हिंदुभगिनीबांधवांच्या हालअपेष्टांची त्यांना कल्पना होईल.
(१) या बंडाच्या धामधुमीत हजारों हिंदु अत्यंत क्रूर रीतीने ठार मारले. कित्येकांची जिवंतपणी आंगांची कातडी सोलून काढण्यांत आली. हजारोंना प्रथम त्यांच्याच हातांनी स्वतः करतां थडग्यांचे खाडे खोदण्यास लाऊन मग त्यांची कत्तल करण्यांत आली. स्त्रिया - पडद्यांतील स्त्रियांवर राक्षसी बलात्कार करण्यांत आलें. हे बलात्कार केवळ तात्कालीक विकारांच्या उमाळ्याने करण्यात आले नसून, त्यांच्या अब्रूचा विचका पद्धतशीर रीतीने एकामागून दुसरा अशा अनेक नरधमांनी अत्यंत अमानुष रीतीने केला! हे सर्व प्रकार इतके चित्तक्षोभकारक झाले की, त्यांना इतिहासांत दुसरी तोडच सांपडणें शक्य नाहीं. हजारों हिंदु जुलमानें बाटविले. हे सर्व प्रकार कशा करितां झाले? तर खिलाफतीच्या नांवानें खिलाफत चळवळ वाढविण्यासाठी; आणि हे सर्व परिणाम गांधी व शौकतअल्ली यांनी खिलाफत सभा स्थापण्यासाठी मलबारला दिलेल्या भेटीमुळेंच घडून आले. त्यांना सरकारचा काहीही विरोध न झाल्यामुळें त्यांनी आपल्या खटपटी खुशाल उघड माथ्याने चालविल्या. खिलाफत-चळवळ्यांना पायबंद लावण्याच्या कामीं मद्रास सरकारचा हिंदुस्थान सरकारनें इनकार केला; अर्थात् हे सर्व अत्याचार प्रत्यक्ष करण्यास उत्तेजन देण्याइतक्याच पापाचें वाटेकरी हिंदुस्थान सरकार आहे. (श्री. शंकरन नायर कृत गांधी अॅन्ड अनार्की` पृ. १००)
(२) टैम्स ऑफ इंडियाचा बातमीदार कालीकतहून ता. ७ सप्टेंबर १९२१ रोजी `राक्षसी अत्याचार` सदराखाली लिहितो:- मलबारांत खिलाफती व असहकारवादी चळवळ्यांनी आपल्या माथेफिरू व भयंकर डांवपेचांनी निर्माण केलेल्या धामधुमीनें, एरनाड वल्लुवनद वगैरें ठिकाणी बंडाची आग कशी भडकली व लुटालुट खून व जुलमी बाटवाबाटवीचे अत्याचार मोपल्यांनी कसे केले. त्याच्या कारणाची मिमांसा पहिल्या पत्रांत केली. या पत्री त्या अत्याचारांचे स्वरूप व तपशील देत आहे. प्रत्यक्ष अनुभवाच्या ज्या हकिकती मी नमूद करीत आहे, त्यांवरून सर्वसाधारण बुद्धीच्या प्रत्येक हिंदुलाही स्पष्ट पटेल की मोपल्यांनी चिळस आणणारे माथेफिरूपणाचे जे जे अत्याचार केले, त्यांच्या मुळांशी आपमतलब, द्रव्याची लालसा आणि सत्तेची हाव याच गोष्टी होत्या.
जीव घेऊन पळालेले लोक किती तरी भयंकर अत्याचारांच्या हकीकती सांगत आहेत. तरुण व देखण्या नायरकन्या व उच्च जातीय तरुणींना त्यांच्या आईबाप व नवऱ्यांपासून जुलमाने ओढून नेऊन, या (पाषाणहृदय) बंडखोर मोपल्यांनी त्यांची सर्व वस्त्रे फाडून टांकली व त्यांना आपल्यासमोर नागव्या उघड्या चालण्यास लाविले आणि अखेर सर्वांनी त्यांच्यावर बिनदिक्कत बलात्कार केले. काही ठिकाणी तर या नराधमांनी आपली माणुसकी विसरून, पाशवी कामवासनेच्या तृप्तीसाठी बारा बारा इसमांनी एकेका तरुणीची इज्जत घेतली. कित्येक सुंदर हिंदु स्त्रिया पकडून त्यांना जुलमानें बाटविण्यात आलें, त्यांच्या कानांना (मोपला पद्धतीप्रमाणे) भोंकें पाडण्यांत आली, त्यांना मोपलास्त्रियांचा पोषाक दिला आणि त्यांना आपल्या तात्पुरत्या बायका बनविल्या. हिंदु अबलांना धमकावणे, त्यांना त्रास देणे आणि अर्ध्या वस्त्रानिशी त्यांना हिंस्रपशूंनी गजबजलेल्या रानावनांत जीव घेऊन पळावयास लावणें, ही तर मोपल्यांची सहज लीला होय.
प्रतिष्ठित हिंदु गृहस्थांना जुलमाने बाटवून, कित्येक मुसलियर व थंगलांच्या साहाय्यानें त्यांचे सुंताविधी करण्यात आले. हिंदुंचीं हजारों घरे लुटली व जाळली. हिंदु-मुसलमान एकीची किती ही घाणेरडी बेशरम चित्रे! आणि याच एकीचे तुणतुणे खिलाफतवाले आणि नॉन्कोऑपरेशनवाले वाजवीत होते ना? छिनाल हलकट मोपल्यांनी हिंदुतरुणींना आपल्यासमोर नागव्या उघड्या स्थितींत धांवण्याची बळजबरी करावी, या हृदयविदारक स्थितींचे दृश्य कोणीही अब्रूदार हिंदु गृहस्थ विसरणार नाही किंवा तें त्याच्या स्मृतिपटावरून खोडलेही जाणार नाही. उलटपक्षी मोपलास्त्रीवर एखाद्या हिंदुने हात टाकल्यांचें उदाहरण मला मुळीच आढळण्यांत आलें नाहीं.
(३) न्यू इंडियांच्या २९ नवंबर १९२१ च्या अंकात मिसेस (आतां डॉक्टर) अॅनी बेझंट `मलबारच्या वेदना` या मथळ्याखाली लिहितात :- गांधींना कोणी तरी या वेळी मलबारांत घेऊन येईल तर बरे होईल. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या व त्यांचे `प्रियकर बंधू` मंहमद अल्ली व शौकत अल्ली यांच्या व्याख्यानांनी घडून आलेले राक्षसी अत्याचार त्यांच्या स्वतःच्या उघड्या डोळ्यांना दिसतील... मुंबईच्या पार्शी स्त्रियांची वस्त्रे (उनाड बंडखोरांनी) फाडल्यामुळें गांधींच्या मनाला मोठा धक्का बसला, हें योग्यच झाले.
विलायती कपडे वापरणे पातक आहे असे या `देवभीरू` टोळभैरवांना शिकविले असल्यामुळें, (पार्शी अबलांचे वस्त्रहरण) हे त्यांना मोठे धार्मिक कृत्य वाटले असेल! पण इकडे मलबारांत हजारों स्त्रिया नुसत्या चिंध्यांवर आपली अब्रू बचवीत आहेत, घरादारांना मुकल्या आहेत. त्यांची धावपळ चालली असता वाटेंत जन्मलेली त्यांची मुले तात्पुरत्या उघडलेल्या आश्रयस्थानांत कशीं बशीं जगत आहेत, त्यांच्याबदल गांधींना थोडासा तरी करूणेचा द्रव येईल काय? मलबारस्थ हिंदु अबलांची करूणकहाणी वर्णन करता येणे शक्य नाहीं. रडून रडून डोळे सुजले आहेत, भीतीनें क्षणोक्षणी कावऱ्याबावऱ्या होत आहेत अशा नुकत्याच लग्न झालेल्या अल्पवयी सुंदर देखण्या मुली, डोळ्यांसमक्ष आपल्या प्रिय नवऱ्याची झालेली अमानुष कत्तल पाहिलेल्या स्त्रिया; (ही कत्तल मोपल्यांनी `शुद्ध धार्मिक भावनेनेच` केली, हें गांधींचे समर्थन लक्षात असावे.) दुःखानें मृत्यूच्या दारांत बसलेल्या वृद्ध स्त्रिया! किती बेशरम अमानुषपणा हो! दोन पुलय्यांचे धर्मप्रेम पहा.
पुलय्या म्हणजे मलबारकडील शूद्रातिशूद्र. अस्पृश्य. हिंदुधर्माने बहिष्कृत ठरविलेली एक हतभागी जात. सावत्र आईप्रमाणे तिरस्कारानें वागविणाऱ्या हिंदुधर्मावर त्यांचें प्रेम किती विलक्षण पहा. मृत्यु किंवा इस्लाम धर्म या दोहोंशिवाय गत्यंतर नाही, असें त्यांना पकडणाऱ्यांनी बजावतांच त्यांनी मुसलमान होण्यापेक्षा मरण पत्करलें. हिंदु आणि मुसलमानांचा परमेश्वर आपले दूत या दोन शूर जीवांना स्वागत देण्यासाठी पाठवो आणि ज्या धर्मासाठी ते मेले त्याच धर्मांत त्यांना पुनर्जन्म देवो!
(३) न्यू इंडिया ६-१२-२१:- अवघ्या १५ दिवसांत हिंदुंची सर्रास अमानुषपणाची कत्तल म्हणजे मोपल्यांच्या हातचा मळ झाला... पुथूर आमनादला एक दिवसभर दिवसा इस्लाम धर्माचा अव्हेर करणाऱ्या २५ हिंदुंची मोपल्यांनी खाटकाप्रमाणे कत्तल केली... लहान लहान अर्भकांचे व गरोदर स्त्रियांचे खून, यापेक्षां अमानुष व राक्षसी अत्याचार आणखी कोणते असतात?... एका सात महिन्याच्या गरोदर हिंदु स्त्रीचे पोट एका मोपल्याने फाडलें व गर्भाशयांतून अर्धेच बाहेर पडलेल्या त्या अर्भकासह त्या बाईचे प्रेत रस्त्यावर उघडे नागडे पडलेले पुष्कळांनी पाहिले...
तरुणीवरच्या बलात्काराची एक हकीकत तर इतकी संतापजनक आहे, इतकी चिळस आणणारी आहे, की तिचे शब्दांनी वर्णनच करता येणार नाही. हा बलात्कार चेंब्रासरी थंगल याच्या खास देखरेखी खालीं झाला. मिलादूरच्या एका अब्रुदार नायर घराण्यांतल्या स्त्रीला, तिच्या नवऱ्याच्या व त्याच्या भावांच्या डोळ्यांसमक्ष, नागवी करण्यांत आली. त्या सर्वांचे हात पाठीकडे घट्ट बांधून टांकण्यांत आले होते. हा प्रकार पहावेना म्हणून त्यांनी डोळे मिटतांच, त्यांना तलवारीच्या धमकीवर, त्या अबलेवर त्या नराधमाने प्रत्यक्ष केलेला अत्याचार पहावयास भाग पाडले. हा प्रकार लिहितांना सुद्धां मला शरम उत्पन्न होते... अशा प्रकारचे आणखीही बरेच अत्याचार झालेले आहेत, पण शरमेसाठी लोक ते प्रसिद्ध करीत नाहीत.
मोपल्यांच्या अत्याचारांचा इतिहास कधींकाळी कोणी लिहिलाच तर त्यांतल्या अमानुषपणाच्या वेदनेनें लेखक प्राण देईल व यदाकदाचित् त्याचें लेखन पूर्ण झालेंच तर हृदय शाबूत असलेले वाचक छाती फुटून मरतील; इतका तो बीभत्स राक्षसी-छे: हीं विशेषणें फारच माणुसकीची ठरतात! असले अत्याचार करणाऱ्या नरराक्षसांना गांधी जेव्हां धर्माभिमानाचें सर्टिफिकीट देतात व त्यांच्या पाशवी दंगलीची `मर्द मोपले` म्हणून प्रशंसा करतात, तेव्हा `महात्मा आहात झालें?` यापेक्षा अधिक काय म्हणावें?
मलबारांतल्या अत्याचारांचा कळस इतका झाला कीं, निसर्गतःच अल्पभाषी असणाऱ्या आमच्या मलबारस्थ हिंदुभगिनी, व्हाईसरॉयच्या पत्नि लेडी रेडिंग यांच्याकडे, अर्जद्वारा हंबरडा फोडण्यास उद्युक्त झाल्या. त्यांच्या अर्जात नमूद झालेली भाषा व विकारांचा उमाळा वाचतांना न रडणारा प्राणी अंतःकरणाने मोपला चाण्डाळच असला पाहिजे. त्यांतील कांही कलमांचा भावार्थ खालीं देत आहों:--
"दयावंत बाईसाहेब, गेल्या शंभर वर्षांत आमच्या या दुःखी मलबारांत मोपल्यांचे दंगे अनेक वेळां झाले. पण चालू बंडाचा व्याप आणि त्याच्या अत्याचारांची क्रूरता पूर्वी कधींच कोणी अनुभवली नाहीं. या राक्षसांनी केलेल्या घातपातांची व अमानुष अत्याचारांची, बाईसाहेब, आपल्याला कदाचित् पुरी कल्पनाही नसेल. अहो काय सांगावे, वाडवडिलांचा प्रिय हिंदुधर्म सोडण्याचें नाकारल्यावरून आमच्या जिवलग नातलगांना अर्धवट ठार मारून त्यांना विहिरीत फेंकून दिलें. प्रेतांनी तळीं सुद्धां भरून टाकली. गरोदर भगिनींची जिवंतपणी पोटें कीं हो चिरली. त्यांच्या शरीराचे राई एवढे तुकडे करून रस्त्यावर व जंगलांत फेंकून दिले. प्रेतांच्या खचांत गर्भाशयांतून अर्धवट बाहेर पडलेली मुलें तशींच तेथे पडलेली. अहो, आमची लहान लहान तान्हुली - काय बरं त्यांनी कोणाचा असा अपराध केला? अहो ती आमची लाडकी तान्ही आमच्या गळ्यातून हिसकावून नेली आणि आमच्या डोळ्यासमक्ष त्यांचे खाटकाप्रमाणे तुकडे तुकडे केले. आमचे प्राणापेक्षाहि प्रिय असे पति, बाप, भाऊ यांचे अतोनात हालहाल केले, कोणाच्या अंगाचीं सालटी जिवंतपणीं सोलली तर कोणाला जिवंत उभे जाळले!
आमच्या शेंकडो बहिणी आप्तेष्टांनी गजबजलेल्या घरांतून फरफरा ओढीत नेल्या आणि त्यांवर या नराधम राक्षसांनी मन चाहील तसे बिभत्स-उच्चारू नये असले अत्याचार केले. आमच्या घरादारांची राखरांगोळी केली. आमची पवित्र देवस्थानें भ्रष्ट केली. आमच्या बागांतून गाईंचे रक्त मांस हाडें आणून ओतली. आज आम्ही मूठभर तांदळालाही वैरी झालों. प्रत्यक्ष भीक मागत आहो... आमच्या डोळ्यांसमक्ष क्रूरपणे कत्तल केलेल्या बचड्यांच्या त्या केवीलवाण्या किंकाळ्या, बाईसाहेब, आमच्या कानांत एकसारख्या घुमत आहेत हो घुमत आहेत! काळ आमचे डोळे झांकीपर्यंत त्या किंकाळ्या कधींच थांबणार नाहीत.
घरादारांची राखरांगोळी झाल्यावर केवळ जीवासाठी आम्ही नागव्या उघड्या स्थितीत कसें रानवन गांठलें, आमच्या लपण्याच्या जागेचा सुगावा लागू नये म्हणून आमच्या अजाण बचड्यांना गप्प रहाण्यासाठी आम्ही कसकसली धडपड केली. या सर्व गोष्टींचे, बाईसाहेब, आज स्मरण होत आहे. या खुनशी चांडाळांच्या धर्माची आम्हा हजारों लोकांवर प्राणांतिक बळजबरी झाली. त्या वेळच्या आमच्या नैतिक व धार्मिक मनाच्या वेदना आजहि आम्हांला तितक्याच तीक्ष्णतेने दंश करीत आहेत. अहो, काय सांगावी आमची कर्मकहाणी! चांगल्या कुलींन घराण्यात वाढलेल्या आमच्या काही भगिनींना या चाण्डाळांनी जेव्हा मुसलमान धर्माची दीक्षा दिली व बळजबरीनें त्यांची कैद भोगलेल्या गुन्हेगार अशा कवडी किमतीच्या मजुरांशी लग्ने लावली, तेव्हांच्या त्यांच्या मरणप्राय मानसिक वेदनांची, बाईसाहेब, आम्ही आपल्याला कशी कल्पना करून द्यावी?"
बस्स, पुरे. मन बेताल होत आहे. लेखणी कांपत आहे. संतापाचा छापा हृदयावर पडत आहे. डोळें पाण्याने भरले आहेंत. विवेक लटपटूं लागला आहे. विचारसरणी सैरावैरा नाचूं लागली आहे. सध्यां याच ठिकाणी थोडा मुक्काम करून मग पुढें जावें हें बरें!
[तब्बल ८ दिवसांचा मुक्काम.]
प्रस्तुत लेखन चालू असतां, ठिकठिकाणी मुसलमानांच्या दंगली होत असल्याची वृत्तें कांनी पडत आहेत. ही केवळ शोचनीयच नव्हे तर, तिरस्कारार्ह स्थिती होय. हिंदुबांधवांशी वैरभाव धरून त्यांच्या विरुद्ध दंगे व बंडे करण्यांत आपला राजकीय व धार्मिक मोक्ष आहे, ही आमच्या एतद्देशीय मुसलमानांची समजूत अत्यंत आत्मघातकी आहे, हे आम्ही त्यांना प्रेमपूर्वक बजावून ठेवतो. `अल्ला हो अकबर`च्या गर्जना करणाऱ्या मुसलमानांना अत्याचारी प्रवृत्ति जशी लाजीरवाणी आहे, त्याचप्रमाणे मुसलमानी अत्याचारांना शेळ्यामेंढ्यांप्रमाणे बळी पडणे हे शिवाजीच्या अनुयायी हिंदुंना नामर्द व बेशरम ठरविणारे आहे.
अत्याचाराच्या जोरावर धर्मप्रसार व धर्मप्रसाराच्या जोरावर स्वतंत्र इस्लाम बादशाही स्थापन करण्याचे दिवस आतां उरलेले नाहीत. इतिहासाला पुनरावृत्तीची गोलांटी उडी मारण्याचे कौशल्य कितीही आंगवळणी पडलेले असले तरी हिंदुंच्या रक्तस्रावावर इस्लामधर्माची पुनर्घटना करण्याची अदूरदृष्टी आकांक्षा अखेर त्या धर्माची सर्व जगभर नाचक्की केल्याशिवाय रहाणार नाही. असा इषारा देणे प्राप्त आहे. अत्याचाराच्या मार्गाने धर्मप्रसार करू पहाणाऱ्या माथेफिरू इस्लाम भक्तांनी आपण २० व्या शतकांत आहों, हे विसरून चालणार नाहीं. कोठे ती अकबर बादशहाची सर्वसंग्राहक व सर्वपाचक धर्मप्रवृत्ति आणि अल्लाहो अकबरच्या आरोळ्या मारणाऱ्या माथेफिरू मुसलमानांची कोठें ही अत्याचारी वृत्ति!
बहुत दिवस माजलेल्या उदंड म्लेंच्छ दुर्जनांच्या बंडावर, छातिठोक प्रतिकाराच्या बरोबरीनेंच पतितपरावर्तनाचा बिनतोड तोडगा सणसणीत भिरकावून, इस्लामधर्माचा लवमात्र अवमान न करता, हिंदुंचा लोकसंग्रह करणारे कोठें ते पुण्यश्लोक शिवाजीमहाराज आणि महाराष्ट्रांत क्रिस्ती बाट्यांनी घातलेला धुमाकूळ उघड्या डोळ्यांनी पहाणारे कोठे हे शिवानुयायी नामर्द मराठे! हिंदु आणि मुसलमान या दोन समाजांचे राष्ट्रीय दैव एकाच बिकट परिस्थितीच्या अधणांत उकडत आहे. दोघांच्याहि उरावर एकजिनसी पारतंत्र्यांचा वरवंटा अभेदभावाने सबसारखा फिरत आहे, अशा वेळी आमच्याच हाडारक्ताच्या - परंतु धर्मांतराच्या शुल्लक सबबीवर सर्वच बाबतीत परकी बनलेल्या हिंदी मुसलमानांनी सरदार करतारसिंग यांची स्पष्टोक्ती ध्यानांत ठेवल्यास बरी!
काही दिवसांपूर्वी रावळपिंडीला जाहीर भाषण करताना सरदार साहेब म्हणाले, "मुसलमान हिंदुओंको कष्ट पहुंचानेका खयाल दिलसे निकाल दे. वह हर जगह को मुलतान नहीं बना सकता. और यदि मुसलमानोंका इरादा वास्तवमें हिंदुओंके साथ किसी तरहकी जबरदस्ती करनेका हो तो ३२ लाख सिक्ख हिंदुओंकेलिय सिर कटानेको तैयार है. जबतक सिक्ख मौजूद हैं मुसलमान हरगिज हिंदुओंपर हाथ नहीं उठा सकेंगे. मुसलमान यह भाव भूले जाय की मुस्तफा कमालपाशा या किसी अन्य मुसलमान शक्तीके द्वारा वे फिर भारतवर्षपर अपना अधिकार जमा सकेंगे. सिक्खोके होते मुसलमानोका यह ख्याल करना भी फजूल है की कोई दूसरी शक्ति बाहरसे आकर हिंदुओंको कुचल सकेंगी. हम जिस तरह हिंदुओं पर अत्याचार होते न देख सकेंगे, उसी तरह मुसलमानोपर भी अत्याचार न होने देयेंगे."
हिंदु व मुसलमान बांधवांनी स्वार्थी चळवळ्यांच्या नादी लागून हातघाईचे प्रसंग आणलेच, तर त्यांत दोघांचाही अधःपात आहे. हे कोणी सांगितलेच पाहिजे असें नाहीं. निदान महाराष्ट्रांत असे प्रसंग येतील अशी आमची मनोदेवता आम्हांला सांगत नाहीं. महाराष्ट्रीय मुसलमान समाज अजून आपल्या मूळच्या हिंदुसंस्कृतीला पारखा झालेला नाहीं. मात्र पूर्वजांवर झालेल्या बळजबरीच्या धर्मांतरामुळे आज त्याच्या हृदयांत संस्कृतीचा घनघोर संग्राम माजून राहिलेला आहे. रक्ताची व संस्कृतीची पर्वा राखावी तर भिन्न धर्मांचे बाह्यांग आड येते; आणि बाह्यांगाची पर्वा करावी, तर हृदयांत बंडाळी माजते! अशा परिस्थितीतहि उत्तर हिंदुस्थानांतला इस्लामी माथेफिरूपणा यदाकदाचित् दुर्दैवाने महाराष्ट्रांत प्रादुर्भूत झालाच, तर मात्र असे खात्रीने सांगतां येईल, की निष्कारण प्रतिकाराची ठिणगी पडून महाराष्ट्राचे मलबार किंवा मुलतान होण्यापूर्वीच शिवाजीचा मराठा निकराचा थैमान करायला मुळींच सोडणार नाहीं.
मराठ्यांची सहिष्णुता वाटेल तेव्हां स्थानभ्रष्ट व विवेकभ्रष्ट होण्याइतकी कमकुवत नसली तरी मलबारी अत्याचार उघड्या डोळ्यांनी पहात स्वस्थ बसण्याइतकें त्याच्या रक्तांतलें शिवतेज आजच भ्रष्ट किंवा पतित खास झालेलें नाहीं. हें एक दुष्ट स्वप्न आहे. ही एक आत्मघातकी कल्पना आहे. आणि हिंदु मुसलमानांच्या दुर्दैवाने इतका अतिप्रसंग येऊन भिडलाच, तर त्याचा परिणाम दोघांच्याही पारतंत्र्याच्या शृंखळा प्राणांतिक घट्ट बसण्यातच होईल, हे सर्वांनी ध्यानांत ठेवावें. हिंदुंचा निःपात केल्यानें हिंदुधर्म व हिंदु संस्कृति ठार मरणार नाही, अशी इतिहासाची ग्वाही आहे.
हिंदुंची कत्तल करून मुसलमानांचा राष्ट्रोदय व भाग्योदय होईल, ही अटकळ तितकीच मूर्खपणाची अवएव त्याज्य आहे. हिंदु आणि मुसलमान हे हिंदुस्थानरूपी विराटपुरुषाचे उजवे डावे हात आहेत. हे दोन अवयव बाह्यतः जरी भिन्न दिसत असले, तरी त्यांच्या दैवाचें बरेंवाईट सांधे एकाच धडाला चिकटलेले आहेत, हें हिंदुप्रमाणे मुसलमानांनीहि लक्षात घ्यावे.
खिलाफतीच्या मृगजळाने राजकीय सत्ताप्राप्तीचा मोक्ष मिळवू पहाणाऱ्या आमच्या हिंदी मुसलमानभाईंनी आपल्या मनोवृत्तीची मुसंडी अत्याचाराकडे कलंडू देण्यापूर्वी निदान मोगल बादशाहीचा इतिहास तरी नीट वाचावा. मोगल बादशाही म्हणजे हिंदुंना नेस्तनाबूद करणारी इस्लामशाही, असा पुष्कळ मूर्खांचा समज आहे. एखाद दुसरा नागीरशहा किंवा औरंगझेब म्हणजे कांही मोगल बादशाही नव्हे. हिंदु आणि मुसलमानांतले धार्मिक मतभेद नाहीसे करून दोनही धर्मातील शुद्ध तत्त्वसहस्यावर त्यांची एकी करण्याचे अनेक यशस्वी यत्न खुद्द मुसलमानी सत्ताधाऱ्यांनी वेळोवेळी केलेले आहेत. बंगालचा सुभेदार हुसेनशहा (१४५२ ते १४७८) यानें या दिशेने केलेली कामगिरी विचार करण्यासारखी आहे.
हिंदु तत्त्वज्ञानाची त्याच्यावर एवढी छाप पडली की त्यानं मालधर बसु नांवाच्या शास्त्राकडून महाभारताचें व भागवताचे बंगालीत भाषांतर करविलें. इतकेंच नव्हे तर हिंदुंच्या सत्यनारायणाच्या धर्तीवर त्यानें सत्यपीराच्या पूजेचा एक नवीनच प्रघात सुरू केला. अस्सल मुसलमानी संस्कृतीचा कोरडा दिमाख मिरविणाऱ्यांना इतिहास असे हटकून सांगत आहे की दिल्लीच्या तक्तावर बसलेल्या १२ बादशहांपैकी ६ बादशहा हिंदु मातांच्या उदरी जन्मलेले होते आणि या हिंदु राजमाता आपल्या हिंदुधर्माचे आचार खास व्यवस्थेने प्रत्यक्ष दिल्लीच्या राजवाडयांत आमरणान्त आचरीत होत्या.
`दिने इलाही`ची कल्पना प्रत्यक्ष आचारविचारांत उमटविणाऱ्या महात्मा अकबराचा नामघोष करणाऱ्या अत्याचारी मुसलमानांना, आपण आपल्या आडदांड पाशवी वर्तनानें त्या थोर अकबराचा कसा अवमान करीत आहोत, याची कोणी कल्पना करून देईल तर बरे होईल. सारांश, हिंदु-मुसलमान भेद हा कृत्रिम आहे. तलवारीच्या जोरावर असंख्य हिंदु बाटवून मुसलमान केले तरी अखेरीस इस्लाम संस्कृतीच हिंदु संस्कृतीनें पचनी पाडली आणि या दोनहि समाजांनी अन्योन्यावलंबनानें हिंदुस्थानासाठी झगडल्यास त्यांत दोघांचेहि कल्याण आहे, इत्यादि अनेक विचार मोगल बादशाहीच्या इतिहासांत ज्याला दिसणार नाहीत, त्याला कसल्यातरी स्वार्थाची कावीळ झाली आहे, असे ठाम समजावें.
हिंदु मुसलमानांचे राजकीय व सामाजिक बाबतीत ऐक्य झालेच पाहिजे. या ऐक्याशिवाय स्वदेशांतल्या स्वदेशांत दोघांचाहि तरणोपाय नाही. दोघेहि इंग्रजी सत्तेचे गुलाम आहेत. गुलामांत जितकी लाथाळी भासते तितकी नेत्यांच्या पथ्यावरच पडत असते. राजकीय व सामाजिक ऐक्यासाठी हिंदुंच्या धार्मिक स्वातंत्र्याचा बळी घेतलाच पाहिजे असे कोणत्या फतव्यांत, खुतब्यांत किंवा कुराणांत लिहिलें आहे? मुसलमानांना जितका स्वधर्माचा अभिमान आहे, तितकाच हिंदुंनाहि आहे. हिंदुस्थानच्या स्वराज्यविषयक चळवळीत हिंदुंच्या जानव्याचा मुसलमानांच्या गळ्याला फास बसल्याचें ऐकिवांत नाहीं. उलटपक्षी ताबुतासारखे मुसलमानी उत्सव साजरे करण्यांत मुसलमानांपेक्षा हिंदुंचीच चढाओढ जास्त असते. तेव्हा धार्मिक स्वातंत्र्य वगळून राजकीय पुनर्घटनेच्या कार्यात मुसलमानांना हिंदुंशी सहकार्य करण्यापुरती एकीची भावना नसेल, तर त्या आत्मघातकी भावनेत शुद्ध अरेरावीपेक्षां दुसरे काहीं नाहीं असेंच म्हटले पाहिजे.
उत्तर हिंदुस्थानात स्वामी श्रद्धानंद यांनी पतितपरावर्तनाची दांडगी चळवळ सुरू केल्यामुळे, हा धार्मिक स्वातंत्र्याचा प्रश्न विशेष पुढें आला आहे. इस्लामधर्म हा मिशनरी धर्म आहे. हे प्रसिद्धच आहे. परंतु हिंदु धर्म हा मिशनरी धर्म नाही, किंवा पूर्वी तसा नव्हता, हें या शुद्धीकार्याच्या आक्षेपकांना कोणी सांगितले? हिंदुधर्म हा मिशनरी धर्म नव्हता, असेंहि गृहित धरले तरी धर्मस्वातंत्र्याच्या दृष्टीनें त्याला मिशनरी धर्म बनविण्याला कोणाची का म्हणून हरकत असावी?
खरें पाहिलें तर बळजबरीच्या बाटवाबाटवीमुळे आणि भिक्षुकशाहीच्या मयत धर्मंमार्तंडांच्या मूर्खपणामुळे धड ना मुसलमान धड ना हिंदु अशा संस्कृतीच्या संग्रामांत पडलेल्या न हिंदुनर्यवनांना त्यांच्या प्रेमाच्या हिंदु धर्मात स्वामी श्रद्धानन्द घेत आहेत, यामुळे अस्सल मुसलमानांच्या अस्सल धार्मिक भावना कां व कशा दुखविल्या जातात हें एक खिलाफतीच्या कोड्याइतकेंच कोडे आहे. परंतु या कोड्याला आपल्या रड्या ओरड्याची साथ देण्यासाठी काही गांधीभक्त हिंदु पुढे यावेत, ही मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. गांधींनी हिंदुमुसलमान-एकीच्या पिटलेल्या डांगोऱ्यांच्या तपशीलाचा विचार केला, तर गांधीभक्तांचे किंचाळणे गैरवाजवी नाही; आणि महात्मा
हिंदु धर्माचें दिव्य
दयानन्द सरस्वति यांच्या पतितपरावर्तनविषयक महत्त्वाकांक्षेचा विचार केल्यास त्यांचे सच्चे शागीर्द स्वामी श्रद्धानंद हिंदुशुद्धीसभेच्या विद्यमाने मोठ्या वर्णनीय धडाडींने करीत असलेली कामगिरी मुळींच गैरशिस्त नाहीं. असें प्रत्येक विवेकी हिंदुमुसलमानाला कबूल करणे प्राप्त आहे. स्वामी श्रद्धानंद धार्मिक क्षेत्रापुरता संस्कृतीचा संग्राम हिंदुस्थानांतून नष्ट करण्याचा चिरस्मरणीय प्रयत्न करीत आहेत. आत्म्याच्या आवडीचा विषय ते आत्म्याला देत आहेत. भाडोत्री धर्मबंधनांनी गुदमरलेल्या संस्कृतीची मान ते मोकळी करीत आहेत. आणि स्वामी दयानंदाचे अपूर्णकार्य अत्यंत निःस्वार्थबुद्धीने पुढे चालवून या प्राचीन आर्यजननीच्या आर्यसंस्कृतीची अब्रु ते संरक्षण करीत आहेत. श्रीकृष्ण भगवंताचा हा हिंदु लोकसंग्रह यशस्वी होवो!
****