दगलबाज शिवाजी
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
दुसऱ्या आवृत्तीविषयी
दगलबाज शिवाजी
SHIVAJI – THE DIPLOMAT
लेखक
श्री. केशव सीताराम ठाकरे,
प्रबोधनकार
प्रकाशक
प्रकाशक - रामचंद्र बाबाजी जाधव
प्रो. दासराम बुक डेपो
बुकसेलर्स अँड पब्लिशर्स, कोल्हापूर
आवृत्ती दुसरी
किंमत अडीच आणे
प्रती २०००
श्रीसुदर्शन प्रेस कोल्हापूर
प्रकाशनवर्ष दिलेले नाही
पुस्तकाविषयी
`दगलबाज शिवाजी` हे १९२६ च्या मे महिन्यात भोर येथील वसंत व्याख्यानमालेत प्रबोधनकारांनी केलेलं भाषण. गोपीनाथराव पोतनवीस आणि शिवप्रेमी शेटे बंधू यांनी हे आयोजित केलं होतं. ते ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी जमा झाली होती. ते गाजलंही खूप. हे भाषण पहिल्यांदा लेख म्हणून जून १९२७च्या प्रबोधनच्या अंकात प्रसिद्ध झालं. त्या अंकालाही खूप मागणी आली. म्हणून या लेखात थोडी भर घालून त्याची पुण्याच्या कोकाटे छापखान्यातून ५ हजार प्रतींची पहिली आवृत्तीही प्रकाशित केली. दुसरी आवृत्ती कोल्हापूरच्या सत्यशोधक दासराम जाधव यांनी नंतर छापली.
प्रबोधनमधल्या मूळ लेखात हा लेख लिहिण्यामागची भूमिका प्रबोधनकारांनी विशद केली होती. ती मूळ पुस्तकात नसली तरी ती पुस्तकासोबत वाचणं गरजेचं वाटल्यामुळे ती इथे देत आहे.
`प्रास्ताविक विचार - हिंदवी स्वराज्याच्या प्राणप्रतिष्ठेसाठीं शिवाजीनें केलेल्या नानाप्रकारच्या उपक्रमांची, यंदाच्या त्रिशतसांवत्सरिक उत्सवप्रसंगीं, विद्वान चिकित्सक संशोधक लेखकांकडून न्यायनिष्ठूर छाननी होईल आणि त्या उपक्रमांवर आजपर्यंत घेतल्या जाणार्या आक्षेपांचा पायाशुद्ध निर्णय लावला जाईल, अशी आम्हाला फार आशा होती. परंतु ती सर्व थैव व्यर्थ गेली. या उत्सवानिमित्त बाहेर पडलेल्या वाङ्मयाचा तो एकच एक स्तुतिपाठाचा एकेरी सूर, येथून तेथून एकजात काव्यकल्पनेच्या वायफळ भरार्या आणि वाचनापुरतीच नाटकी वीरश्री उत्पन्न करण्याचा प्रयत्न करणारी ती शाब्दिक फापटपसार्याची सरबत्ती इत्यादि प्रकार पाहून एकरकमी श्रीखंडी मेजवानीप्रमाणें हजारों चाणाक्ष वाचकांच्या तोंडास मिठ्ठी बसली असेल. म्हणून प्रस्तुत लेखांतील विचारांची पुदिनामिश्रित लवंग्या मिरचांची चटणी त्यांच्या सेवेला रुजू करीत आहों. भावनाप्रधान, नाटकी आणि भरंसाट गोडीळ वाङ्मयामुळें झालेल्या अजीर्णावर प्रबोधनाच्या सडेतोड विचारांची ही फणकेदार चटणी वाचकांना बरीच रुचकर लागेल, अशी आशा आहे.`
सचिन परब
संपादक, प्रबोधनकार डॉट कॉम
``There is always a sacred veil to be drawn over the beginnings of all governments.’’
Edmund Burke
महाराष्ट्रापुरताच विचार केला, तर आज हिंदूंची तेहतीस कोटी देवांची फलटण पेनशनीत निघून, त्या सर्वांच्या ऐवजी एकटा शिवाजी छत्रपती परमेश्वर म्हणून अखिल म-हाठ्याच्या हृदयासनावर विराजमान होऊन बसला आहे. शिवाजी म्हणजे म-हाठ्यांचा कुळस्वामी आणि महाराष्ट्राचा राष्ट्रदेव. `गॉड सेव्ह द किंग’ या राष्ट्रगीताचे सूर बॅडमध्ये निघताच इंग्रेज लोकांत जे एक वर्णनीय चैतन्याचे वारे चटकन थरारते. तेच चैतन्य एका शिवाजी या नामोच्चारात अवघा महाराष्ट्र अनुभवतो. वंदे मातरम् या राष्ट्रगीतालासुद्धा अजून म-हाठ्यांची अंतकरणे काबीज करता येत नाहीत; याचे कारण शिवाजीशिवाय इतर कसल्याही भावनेला तेथे जागाच उरलेली नाही. एवढे ज्या शिवरायाचे महात्म्य, त्याला `दगलबाज’ हे विशेषण लावणेचे धाडस प्रबोधनकारासारख्या जातिवंत म-हाठ्याने करावे, ही वस्त्रगाळ निमकहरामी होय! अशा शंकेचे काहूर वाचकांच्या वृत्तीत उठल्याशिवाय खास राहणार नाही.शिवरायासारख्या राष्ट्रवीराची कुचेष्टा करून, आपली प्रतिष्ठा वाढविणेचा प्रबोधनकाराचा हा बाष्कळ प्रयत्न तर नसेल? असाही कित्येक तर्क बांधतील. सर्व शंकितांना आम्ही आगाऊच ग्वाही देऊन ठेवतो की प्रबोधकाराच्या खाणीच्या इतिहासात निमकहरामी आणि आत्मप्रतिष्ठा आजपर्यंत कोणलाही आढळलेली नाही. लेखन-संस्काराच्या गंधाक्षता प्रथम वाहून शिवचरित्राला चिरंजीव करण्याची आद्य कामगिरी याच खाणीतल्या बखरकारानी बजावलेली आहे. कालौघाने शिवरायाच्या शिव चारित्र्यावर लौकिकी कल्पनांनी जर भलभलत्या रंगांचा मारा करून, त्याचे खरे उज्ज्वल रूप विकृत केले असेल, अगर ते तसे झाले असेल, तर त्याचा सप्रमाण मुद्देसूद निरास करून, लोकमताच्या वाजवी प्रबोधनासाठी प्रबोधनकाराने आपले शिवप्रासादिक कलमास्त्र परजणे, त्याचे कर्तव्यच आहे. हे कटू कर्तव्य आहे. कल्पना किंवा अंधश्रद्धेने काढलेले शिवरायाचे चित्र बाजूला सारून, त्या राष्ट्रवीराची खरीखुरी प्रतिमा धिटाईने लोकापुढे मांडणे, म्हणजे लोकक्षोभाला बळेच आव्हान देण्याइतकेच भयंकर काम आहे. पण ते कोणी तरी केव्हा तरी करणेच प्राप्त असल्यामुळे, लोकक्षोभाची पर्वा न बाळगता हौसेने ते आम्ही आपल्या शिरावर घेतले आहे.
शिवरायास आठवावे
का आठवावे? आम्हाला तो नित्य आठवतोच का? विसरू म्हटले तरी तो का विसरला जात नाही? शिवरायाने केले तरी काय, की त्याचे महाराष्ट्राने आमण स्मरणच करावे? माणसांची माणुसकी त्यांच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याने होत असते. ज्या राष्ट्राला स्वातंत्र्य नाही, परकीयांच्या राजसत्तेखाली जे जगत असते, त्या राष्ट्रातल्या माणसांना `ह्यूमेन कॅटल’ माणशी गुरेढोरे हीच संज्ञा यथायोग्य शोभते. शिवाजीच्या हृदयात राष्ट्रधर्माच्या या तीव्र भेदाची विद्युल्लता चमकेपर्यंत, सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत, महाराष्ट्रातला
हिंदू म्हणजे ह्यूमन कॅटल
बनलेला होता. तोंड असून मुका, कान असून बहिरा, डोळे असून आंधळा आणि माणूस असून परकीय मुसलमानी सत्तेच्या पखाली वाहणारा बैल होऊन राहिला होता. गुलामगिरीचा पेंड कडबा खाऊन खाऊन हा बैलसुद्धा इतका मस्तवाल बनला होता, की इस्लामी मानपानाच्या नक्षीदार झुली घुंगुरमाळांनी नटलेल्या त्याच्या अनेक पुढारी नंदीबैलांनी शिवाजीच्या राष्ट्रीय प्रबोधन – कार्यात शेकडो वेळा शिंगे खुपण्यास कमी केले नाही.
महाराष्ट्राला माणुसकी देण्याच्या महत्कार्यात विरोधाचे जितके जितके बाण शिवाजी-गरुडाच्या काळजात घुसले, तितक्या तितक्या
बाणांचा पिसारा स्वकीयांच्याच पंखाचा
होता. दारच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा घरच्या विरोधकांशी झगडण्यातच शिवाजीच्या अर्ध्याअधिक हिंमतीचा होम करावा लागला. अशा अवस्थेतही शक्तियुक्तिची पराकाष्ठा करून, शिवाजीने महाराष्ट्राला स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचा सोहळा दाखवून, मराठ्यांना पशूवृत्तीतून माणसात आणून बसविले. जी गोष्ट एका काळी अखिल महाराष्ट्राला अशक्य वाटत होती, आजही जी पुन्हा अशक्य अशक्य अशक्य म्हणून परिस्थिती आम्हाला दटावून बजावीत आहे, तीच नेमकी गोष्ट शिवाजीने शक्य करून दाखविली. या एकाच कारणासाठी महाराष्ट्राने शिवरायाला अखंड आठवले पाहिजे आणि तसा तो आठवीतही आहे. परंतु, शिवरायाच्या चरित्राकडे महाराष्ट्र आज ज्या दृष्टीने पाहत आहे ती आमच्या हाडीमासी भिनलेल्या अवतार-कल्पनेने आरपार बुरसटून गेलेली असल्यामुळे, शिवरायाच्या विकृत चरित्र-चित्राच्या भजनी आमची टाळकुटी भावना फुकट खर्ची पडत आहे. इतकेच नव्हे, तर त्यामुळे शिवाजीच्या राष्ट्रोद्धारक विराट व्यूहाबद्दल आम्हाला फारसा गंभीरपणाही वाटेनासा झाला आहे. शिवाजीचा स्वराज्योपक्रम म्हणजे ईश्वरी संकेताने आणि `समर्थांच्या’ कृपेमुळे सहजगत्या घडून आलेला एक नवलाईचा चमत्कार, इतक्या हलक्याफूल भावनेने आम्ही त्या प्रचंड प्रबोधनाकडे पाहत आहो. पुराणांच्या पारायणाने पंगु बनलेल्या आमच्या मनोवृत्तीला, शिवचरित्राची कमावणी होईनाशी झालेली आहे. शिवचरित्रातील मोठमोठे प्रसंग म्हणजे बाल-कृष्णाच्या पूतनाकर्णाप्रमाणे `ईश्वरलीला’ वाटतात. कोणत्याही पुरुषोत्तमाच्या चारित्र्यावर एकदा का
अवतार कल्पनेचा सफेदा
चढला आणि त्याची सर्व लहानमोठी बरीवाईट कृत्ये `ईश्वरीलीला’ सदरात पडली की त्या चरित्रापासून आत्मोद्धारार्थ लागणारे स्पिरिट मनुष्याला केव्हावी प्राप्त होत नसते. रामकृष्णांची उज्वल चरित्रे आज आमच्या व्यवहारात कवडीमोल होऊन बसली आहेत, याचे तरी कारण हेच. रामविजय हरिविजय, पांडवप्रताप हे ग्रंथ म्हणजे चातुर्मासात सोवळ्याने वाचायचे आणि श्रोत्यांनी झोपांच्या डुलक्यात ऐकायचे. का? तर म्हणे तेवढेच पुण्य गाठी! मराठी महाभारत कपाटाच्या शोभेला. टिळकांचे गीतारहस्य देव घरात फक्त पूजेला. का तर टिळक म्हणे शेषशायी चतुर्भुज भगवान्! टिळकांना भगवान बनविल्याशिवाय आम्हा नादान हिंदूंच्या भाविकपणाचा भाव कसा वाढणार? जिकडे पहाल तिकडे
पौराणिकी दृष्टीचा अडथळा
शिवाजीचा काळ होऊन आज अडीचशे वर्षे झाली, तरीदेखील त्याच्या चारित्र्याला जगाची एकमुखी मान्यता अजून मिळालेली नाही. महाराष्ट्राला तो परमेश्वरावतार वाटत असला, तरी एकट्या हिंदुशिवाय इतर सर्व जगाला तो दगलबाज, डोंगरातला उंदीर, उपटशुंभ असाच वाटतो. पुण्यात कै. शाहू महाराज करवीरकरांनी शिवाजी मेमोरियलचा धाडशी प्रयोग केल्या दिवसापासून राज्यकर्त्या इंग्रेजी नोकरशाहीची शिवाजीविषयी भाषा किंचित नरमलेली आहे. निदान ओठांवर तरी बरीच साखर चमकते, मग पोटात काय असेल ते पोट जाणे! परंतु शिवछत्रपतीची जगमान्यता अजून जवळजवळ साशंकावस्थेतच आहे, असे कबूल केल्याशिवाय सुटका नाही. याचे कारण काय? राष्ट्रवीरांची कीर्ती जगविश्रुत करण्याची कामगिरी वास्तविक इतिहासकारांनी करावयाची असते. परंतु आमचे म-हाठी इतिहासकार अथपासून इतिपर्यंत एकजात पुराणिक. पौराणिक साच्याशिवाय त्यांची विद्वत्ता कशातही ठाकठीक बसायची नाही. प्रथम शिवाजीला ते परमेश्वराचा अवतार बनवतील, कौसल्येप्रमाणे जिजाबाईला दिल्लीपती मोंगलाच्या वधाचे डोहाळे पाडतील, तेव्हा कोठे त्यांना `शिवसंभव’ दिसायचा. थोडासा सत्याचा धागा, त्यांवर यांच्या कल्पनेच्या कोलांट्या उड्या! ना त्यात विवेक, ना चिकित्सा, ना साक्षेप. येथून तेथून भावनावशतेचा खरकटवाडा, शक्याशक्यतेचा विचार नाही, परिस्थिती-परीक्षणाची दृष्टी नाही, फार काय पण, मानवी स्वभाव ओळखण्याचीही अक्कल नाही. काय म्हणे.
``शिवाजी सोळा वर्षांचा झाला नाहीं तोच
त्याने आडदांड लोकांची संगत धरून
देशात पुंडी आरंभिली.’’
ही आमच्या शिवरायाच्या चरित्राची सुरुवात आणि ती क्रमिक इतिहासपुस्तकातून आमच्या मुलांना पढवायची. आडदांड लोकांची संगत धरून देशात पुंडाई आरंभणा-याला जर स्वराज्य स्थापन करता येते, तर आज गावोगावचे गुंड राष्ट्रवीर का बनत नाहीत? या सर्व दोषामुळे आमच्या जुन्या बखरी आणि सध्याचे इतिहासग्रंथ शिवाजीच्या जगमान्यतेच्या कामी नालायक ठरलेले आहेत. आमच्या लाडक्या हीरोबद्दल कोणी वाईट बोलला तर त्याच्या विधानाला समर्पक प्रत्युत्तर देण्याऐवजी आम्ही नुसत्या शिव्याश्रापांवरच आमच्या इतिहास-विषयक प्राविण्याचे प्रदर्शन करतो. नाहीतर आमचा हीरो ईश्वरावतारच असल्यामुळे त्याच्या सर्व ब-यावाईट कृत्यांना पुराणांच्या पोतड्यातील रामकृष्णांच्या तत्सम कृत्यांचा पाठपुरावा दाखवून, `या देवाच्या लीला, माणसांना कसच्या कळणार!’ म्हणून शेरा ठोकून स्वस्थ बसतो. शिवाजीला कोणी दगलबाज म्हटले की आमच्या नाकाचा शेंडा फुरफुरू लागतो.पण शिवाजी दगलबाज कसा नव्हे? का असू नये? याचा मात्र विवेकशुद्ध विचार आम्हाला कधी सुचायचा नाही. रूढ पौराणिकी मताची पर्वा न करता हा विचार खुलासेवार आज चर्चेला घेतला आहे.
शिवाजीवर अहिंदूंचे आरोप
तरी काय आहेत? याची यादी प्रथम घेऊ या. शिवाजीवर पहिला आणि ठळक आरोप म्हणजे राजद्रोहाचा. त्याने विजापूरच्या अदीलशाहीविरुद्ध म्हणे बण्ड उभारले. कोणत्या तरी प्रस्थापित राजसत्तेला मूठमाती देऊन तेथे नवीन सत्ता स्थापणा-या कोणत्याही चक्रवर्तीची आणि सम्राटाची या आरोपातून सुटका होणे शक्य नाही. इंग्रेजांनी तरी म-हाठी साम्राज्य घशात घालताना काय अशा मोठ्या हुतुतूच्या लढाया दिल्या, तर युद्धातील विजयाच्या निर्णयावर त्यांची या आरोपातून सुटका होते! त्यांनी तर मराठ्यांच्या घरात शेकडो कटांची पोखरण घालून, आज याला फोड उद्याला त्याला बनव, परवा तिस-यालाच चवथ्याच्या उरावर घाल, अशाच घालमेली केल्या ना! मग इंग्रेजांनी म-हाठ्यांचा राजद्रोह केला, अशी भाषा का पुढे येत नाही! तर आज हिंदुस्थानात इंग्रेजी राज्य जबरदस्त आहे. नवीन राज्ये कमविणारांवर राजद्रोहाचा आरोप करणा-या मतिमंद मूर्खांनी इतके तरी लक्षात ठेवावे की नवीन देऊळ बांधताना जुन्या देवळाला आमूलाग्र उलथून पडावेच लागते. ब्रिटीश रक्ताच्या ब्रिटिशांनीच अमेरिकेतून ब्रिटिश सत्तेची उचलबांगडी करून नवीन संयुक्त अमेरिकन संस्थानांची स्थापना केली. मग जॉर्ज वॉशिंग्टन हा सुद्धा मोठा दगलबाज राजद्रोही मानला पाहिजे. नंबर २ – शिवाजीने अफझुलखानाचा `खून’ केला. जणू काय अफझुलखान म्हणजे एखादा बावला किंवा श्रद्धानंदच! नंबर ३ – शिवाजी आग्र्याच्या बादशाही कैदेतून पळाला, म्हणून तो दगलबाज, असले हे आरोप केवळ बुद्धिभ्रष्टता अगर जातिवंत दुष्टावा यातूनच निर्माण होत असतात. राजद्रोह दगलबाजी विश्वासघात इत्यादी आरोप करणारे शहाणे स्वतःची भूमिका तर विसरतातच, पण हे आरोप कोणी कोणावर कोठे केव्हा आणि का करावे, याचा विवेकही त्यांच्या गावी नसतो. मुसलमानांनी शिवाजी विरुद्ध हात बोटे चोळली तर त्यात काहीतरी वाजवीपणा आहे. कारण, शिवाजीने दक्षिणेतल्या मुसलमानी सत्तेच्या चांदता-यालाच आचंद्रार्क अर्धचंद्र दिला! पण
इंग्रज म्हणजे न्यायाचा सागर
आणि हिस्टॅरिकल परस्पेक्टिवचा आगर! त्यांनी शिवाजीवर खुनाची आणि दगलबाजीची एवढी आग का पाखडावी? एकसुद्धा इंग्रज इतिहासकार आढळत नाही की ज्याने अफझुलखानाच्या वधाचा पारवा करून शिवाजीवर शिव्यांची लाखोली वाहिलेली नाही. प्रतापगडच्या मुकाबल्यात अफझुलखानाने आपल्या प्रतिज्ञेच्या संकेताप्रमाणे शिवाजीचाच कोथळा काढला असता, तर त्याविषयी निस्पृहपणाची मिजास मारणा-या इंग्रेज इतिहासकारांनी काय उद्गार काढले असते, याची कल्पनासुद्धा बरीच मनोरंजक होईल. इंग्रेज हा असा एक विलक्षण प्राणी आहे की त्याला इतरांच्या डोळ्यांतील मुसळ मात्र मुळीच दिसत नाही. न्यायबुद्धीची यांची घमेंड जगप्रसिद्धच आहे; परंतु त्यात एक मख्खी आहे. आपमतलबासाठी इंग्रेजी न्याय कधी पृथ्वीइतका फुगेल तर कधी सुईच्या डोळ्यांतून सफाईत निसटून टाचणीच्या टोकावर तांडवनृत्य करील.
शिवाजी एक वेळ राहू द्या; बोलून चालून तो हिंदू. पण नेपोलियन बोनापार्ट तर युरपियनच ना? त्याच्या चारित्र्याचे सार काढताना विद्यमान सुप्रसिद्ध इतिहासकार एच. जी. वेल्स आपल्या `औटलाइन्स ऑफ धी हिस्टरी ऑफ धी वर्ल्ड’ नामक महाग्रंथांत काय अक्कल पाघळतात ती पहा –
It would be difficult to find a human being less likely to arouse affection. One reads in vain through the monstrous accumulations of Napoleonic literature for a single record of self forgetfulness. Laughter is one great difference between man and lower animals, one method of our brotherhood, and there is no evidence that Napoleon ever laughed. Nor can we imagine another of the most beautiful of human expressions upon the face of this saturnine egotist, that expression of disinterested interest that one sees in the face of an artist or artisan `lost’, as we say, in his work. Out of his portraits he looks at us with a thin scorn upon his lips, the acorn of the criminal who believes that he can certainly cheat such fools as we are, and with a certain uneasiness in his eyes. That uneasiness haunts all his portraits. Are we really convinced he is quite right? Are his laurels straight? He had a vast contempt for man in general and men in particular, a contempt that took him at last to St. Helena, that same contempt fills our jails with forgers, poisoners and the like victims of self-conceit. There is no proof that this unbrotherly, unhumorous egotist was ever sincerely loved by any human being. The Empress Josephine was unfaithful to him as he to her. His young Austrian wife would not accompany him to Elba. A certain polish countess followed him thither but not, it would seem, for love, but an account of the son she had borne him. She wanted settlements. She stayed only two days with him. He had never even a dog to love him. He estranged most of his colleagues and fellow generals. He had no familiar friend. No one who knew him felt safe with him. In his intimacy, his unflinching self-concentration must have been a terrible bore. His personal habits were unpleasant; the moodiness of bad health came to him early. True it is that his solders, who, save for a rare melodramatic encounters, saw nothing of his idolized their ``Little Corporal’’. But it was not him they idolized, but a carefully fostered legend of an incredibly clever, recklessly brave little man, a little pet of a man, who was devoted to France and them – p. 499.
लोकशाहीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी युरपस्थ राजेशाहीला नेस्तनाबूद करणा-या सवाई शिकंदर नेपोलियन चक्रवर्तीला विसाव्या शतकातले हे इंग्रज इतिहासपंडित जर बाबू चष्मावाल्याच्या वर्गात ढकलतात, तर १८व्या आणि १९व्या शतकातल्या यांच्या व्यवसाय पूर्वजांनी शिवाजीला उनाडटप्पू दरोडेखोराच्या सदरात घातले, तर त्यात काय नवल? तरी बरे की इतरांवर घाणेरडे आरोप करणा-या या आंग्ल चिकित्सकांच्या ब्रिटन राष्ट्राच्या साम्राज्यवर्धनाच्या खटपटी अगदीच काही धुतल्या तांदळाच्या नव्हेत. शिवाजीवरील खुनाच्या आरोपाचे खण्डन करणारे
विलायती व गावठी वकील
पाहिले तर त्यांची नंदीबैलातच गणना करावी लागेल. यांचा डिफेन्स आणि विधाने पाहिली तर रडू येण्यापेक्षा हसूच फार येते. काय म्हणे शिवाजीने आत्मसंरक्षणासाठी वाघनखाचा उपयोग केला. आणखी काय? तर प्रथम वार कोणी केला, यावरच वादविवादाची धुमश्चक्री. आणि अफझुलखानाने ज्याअर्थी, ज्या पक्षी, ज्या अन्वये, शिवाजीला प्रथम बगलेत दाबून त्याच्या मस्तकावर प्रथम तलवार चालवून आगळीक केली, त्या अर्थी त्या, पक्षी, त्या अन्वये, शिवाजीने आत्मरक्षणार्थ वाघनख चालविल्यामुळे, खुनाचा आरोप त्यावर सिद्ध होत नाही. बावलाने रिवॉल्वर प्रथम झाडले, का शफी दिल्याने झाडले, असल्याच क्षुद्र वादावर या विलायती व गावठी वकिलांची भिस्त जणू काय, अफझुलखानाच्या खुनाबद्दल फाजलखानाने फिर्याद दिली आहे. अदीलशाहीच्या शिफारसीने इंग्रेजी सेशन कोर्टात शिवाजीवर खटला चालू आहे आणि हे विलायती गावठी बॅरीस्टर शिवाजीच्या तर्फे ब्रिटिश इंडियन पिनल कोडातील कलमांवर आपल्या वकीलाईची कसरत करीत आहेत!
शिवाजी हा कोण, त्याचे ध्येय का, कर्तव्यक्षेत्र कोणते, त्याच्या कृत्यांची परीक्षा कोणत्या दृष्टीकोणाने केली पाहिजे, इत्यादि महत्त्वाच्या मुद्यांची आणि या वकीलांची फारकतच असल्यामुळे, त्यांनी साध्या संसा-याला लागू पडणा-या नीतिनियमांच्या कक्षेत या राष्ट्रसंसा-याला ओढावे, यात त्यांच्या बुद्धिमांद्याशिवाय विशेष काहीही निष्पन्न होत नाही. राष्ट्रसंसा-यांना कर्तव्याकर्तव्याची जी बिकट त्रांगडी सोडवावी लागतात, ती ते कोणत्या भूमिकेवरून कशी सोडवितात, याचे परोक्ष ज्ञान या लौकिकी नीतिवंतांना नसल्यामुळेच, ते `जन्माला आला हेला, कसातरी जगून मेला’ अशा साध्यासुध्या संसा-याच्या भूमिकेवरून शिवाजीसारख्या राष्ट्रसंसा-याच्या कर्माकर्माचे परीक्षण करण्याच्या पोरकट फंदात पडतात. सतत पाच वर्षे युरपियन महायुद्ध मर्दुमकीने खेळविणा-या जर्मन कायझर वर खटला भरण्याच्या पाचकळ वल्गना असल्याच क्षुद्र बुद्दीची अवलाद होय. ही क्षुद्र बुद्धीची उर्फे नीतीची चाड बाळगणारांनी खुशाल धंदेवाईक पुराणिक म्हणून मिरवावे. पण त्यांनी स्वराज्यसंस्थापक राष्ट्रवीरांच्या चारित्र्याची चिकित्सा करू नये. ते त्यांचे क्षेत्र नव्हे तो त्यांचा अधिकार नव्हे.
वाकड्या दरात वाकडी मेढ
ठोकणारेच पुरुषोत्तम राष्ट्रवीर होऊ शकतात. ते साधुसंताचे आणि `सत्य सदा बोलावे’वाल्यांचे तों नव्हे. साधुवृत्तीने आणि संसारी नीतीने राज्ये कमाविल्याचा दाखला इतिहासात नाही. राज्याची प्राणप्रतिष्ठा म्हणजे टाळकुट्या साधुसंतांची भजन-प्रतिष्ठा नव्हे. त्यांतल्या त्यात गुलाम बनलेल्या देशाची महिरलेली मनोवृत्ति चैतन्यपूर्ण करून परकीय सत्तेच्या मुडद्यावर स्वराज्याचा पाया उभारणारा वीर साधुवृत्तीचा असून भागतच नाही. असे आजपर्यंत कधी कोठे घडले नाही, पुढे कधी कोठे घडणार नाही. ``एका गालावर कोणी चापड मारली तर लागलाच दुसरा गाल पुढे कर’’ याक्रिस्त धर्माज्ञेप्रमाणे युरपस्थ क्रिस्तीजन अक्षरशः वागते, तर त्यांना हिंदुस्थानचे साम्राज्य कधीच मटकावता आले नसते. महंमद गिझनीपासून तो थेट बाबर हुमायूनपर्यंतचे लोक जर नुसते माळा ओढणारे आणि नमाज पढणारे मुल्ला मौलवी असते तर मोंगल साम्राज्याची स्थापना होतीच ना. त्याचप्रमाणे सत्य, नीति, वचन, इमान असल्या साधुवृत्तीच्या फाजील फंदांत रजपूत जर निष्कारण गुरफटले नसते, तर त्यांचाही अधःपात इतक्या लवकर खास झाला नसता आणि शिवाजी जर दगलबाजातला दगलबाज, लुच्चातला लुच्चा, खटातला सवाई खट आणि उद्धटातला दिढी दुपटी उद्धट नसता, तर त्यालाही म-हाठी स्वराज्य यावज्जन्मांत स्थापन करता आले नसते. नेहमीचा व्यवहार पाहिला तरी
सतीच्या घरी बत्ती
आणि वेश्येच्या घरी झुलेहत्ती, हाच प्रकार चालू असतो. सख्य, न्याय, समता, प्रामाणिकपणा इत्यादी तत्त्वे पुराणांसाठीच जन्माला आलेली आहेत. लिहिण्याबोलण्यात त्यांची फोडणी फार खमंग लागते. एखाद्या गोमाजीच्या चारित्र्यावर थोरपणाची सफेदी चढवून, त्याच्या चरित्राचे ग्रंथ विक्रीला लायक ठरविण्याच्या कामी, ही तत्त्वे लेखक बखरकरांना शाई लेखणी इतकीच उपयुक्त असतात. परंतु, प्रत्यक्ष व्यवहारात या तत्त्वांनी आजवर एकाही मनुष्याचा भाग्योदय केल्याचे उदाहरण आढळणार नाही. अमक्या तमक्याने म्हणे ५ दिडक्यांवर भाजीविक्याचा धंदा आरंभून १५ वर्षांत तो लक्षाधीश झाला! फलाण्याने डोक्यावर टोप्याचे शिप्तर घेऊन टोप्या विकता विकता, अमुक वर्षांत फेरीवाल्याचा म्हणे कोट्याधीश झाला! गोम्यासोम्या म्हणे रस्त्यावर खडीच्या पाट्या वाहात होता, तो आज हिंदुस्थानातल्या सगळ्या रेल्वेचा कंट्राक्टर होऊन, रोल्स राईसशिवाय पाऊल बाहेर टाकीत नाही! दहा वर्षांपूर्वी हातात एक फुटका लोटा घेऊन नागडा उघडा भटकत आलेला मा4रवाडी म्हणे मोडतोड तांबा पित्तलवर आज अब्जाधिपति बनला! आणि-आणि लोकांना दाखवायचे भासवायचे काय? तर हे सगळे नरमणि सत्यं वद, धर्म चर इत्यादी गुणांच्या भांडवलावर बडे भांडवलवाले बनले! हे सारे वस्त्रगाळ नीतिमत्तेचे पुतळे. पाप म्हणून यांच्या गावी नाहीच. व्यवहाराच्या खाच खळग्यांवरून जाताना ना कधी यांचा पाय पापाच्या पिसावर पडला, ना कधी घातपाताच्या वळणावर अडला.
यांनी प्रत्येक कर्म देवाधर्माची जाणीव ठेऊन केलेले. यांचे इमान? आहा! ते काय विचारावे? सगळे हरिश्चंद्राचे अवतार! स्वप्नात दिलेली वचनेसुद्धा जागे झाल्यावर फडशा पाडणारे! पापभीरूत्वाच्या काचेच्या सीलबंद बरणीतल्या या सा-या धर्मवान सत्यवान नीतिवान् शीलवान् कापट्या! बिचा-यांना पापाची नुसती झुळूक सुद्धा कधी चाटून गेलेली नसायची. किटसन दिव्याची मॅन्टलेच ही! आरपार उभा आडवा खाली वर उजेडच उजेड आणि तेजच तेज. वाचकहो, असल्या गप्पा लुच्या गप्पिष्ठांनी माराव्या, पोटभरू किंवा रिकामटेकड्या लेखकांनी लिहून प्रसार कराव्या आणि बावळट श्रोत्या वाचकांनी नंदीबैलाप्रमाणे माना हालवून मान्य कराव्या, यापेक्षा त्यात विशेष काहीच नसते. कोण गोमाजी द्रव्यप्राप्तीच्या शर्यतीत काय काय लपंडावांनी भरारतो, याचा तपशील पुष्कळांना अवगत असतो. परंतु व्यवहाराची मायाच अशी मायावी आहे की, त्या तपशिलांचा उच्चार कोणा फारसे करीतच नाही. त्यात पुन्हा त्या गोम्यासोम्याला लक्ष्मी प्रसन्न झालेली! मग काय, सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते. अर्थात संपत्तीच्या झगझगाटाखाली दडलेला पापांचा आणि घातपातांचा भगभगाट उकरण्याच्या अव्यापारेषू व्यापारात पडण्याची लोक सहसा तसदी घेत नाहीत. वकिलांचे वाडे विद्धत्तेच्या विजयावर वसले जातात काय? स्मृतिग्रंथांत वकिलांच्या वृत्तीविषयी घातलेले नीतिनिर्बंध जर अक्षरशः पाळले जाते आणि विद्यमान सरकारांनी ठरविलेल्या वकिली फीच्या कोष्टकातच जर त्यांचे द्रव्यप्राप्तीचे प्रमाण मर्यादित राहते, तर बाराबंदी बंडी, मांडपंचा आणि गांधीटोपी पलीकडे काही वकिलाचे ऐश्वर्य फुगले नसते. नोकरी चाकरी किंवा अर्थोत्पादनाचा कसलाही लौकिकी धंदा न करता, फक्त `देशभक्त’, म्हणून व्याख्यानबाजी आणि लेखनबाजी करीत जगणा-या अनेक ब्राह्मण लोकांनी ठिकठिकाणी मोठमोठे वाडे बांधले आहेत, आणि सावका-याही सुरू केल्या आहेत, त्या काय सा-या `वंदे मातरम्,’ राष्ट्रगीत पारायणाच्या तात्कालीक फलश्रुत्याच मानायच्या की काय? अंगावर खादीच्या चिंध्या पांघरून देशासाठी भिक्षा मागत गावोगाव व खेडीपाडी भटकणा-या संभावित भिक्षकांच्या सौभाग्यवती गोटपाटल्यांत चमकताना दिसतात. त्या काय खादीच्या आडव्या उभ्या ताणाच्या तणावावर की काय? लिमिटेड कंपन्यांची आणि देशी बँकांची दिवाळी वाजवून, कफल्लक अवस्थेत नादारीची सनद पटकविणा-या `थोर’ माणसांच्या नशिबी नादारोत्तर काळीसुद्धा मोटारी, बंगले, शेतवाड्यांचे ऐश्वर्य तसेच चिकटून राहिलेले आढळल्यास, तो देखील नीतिमत्तेचा एक श्रुतिस्मृतिपुराणोक्त दिग्विजय मानायचा की काय? नीतिनियमांची पुराणे आणि लौकिकी व्यवहारांची गुप्त अर्धगुप्त वा उघडगुप्त धोरणे, यांचा समन्वय लावण्याचे काम म्हणजे या जगातला एक ब्रह्मघोटाळाचा होय. तात्पर्य, लौकिक व्यवहार जसा दिसतो, तसा वास्तवीक मुळीच नसतो, म्हणूनच बावळट माणूस बोलता बोलता सपशेल फसतो. जीवो जीवस्य जीवनम्. मोठ्या माशाने धाकट्या मासोळीला मटकावून जगावे. ज्ञान्यांनी अज्ञान्यांची घरेदारे लुटून आपले वाडे शृंगारावे. जबरदस्तांनी कमकुवतांना जिंकून दास बनवावे. सत्य, न्याय, प्रेम, अहिंसेची कास बळकट धरणा-या नामर्द षंढांना युक्तिबाज, दगलबाज बाजीरावांनी हासत हासत चिरडून जमीनदोस्त करावे. ज्याच्या हाती शिकार त्याने पारधी म्हणून मिरवावे. हाच जेथे सृष्टीत चाललेल्या `जगण्याच्या धडपडी’चा आत्माराम, तेथे एका चोराने दुस-या चोरावर दगलबाजीचा आरोप करावा. ही तरी दगलबाजीच नव्हे काय?
दगलबाज नाही कोण?
दुनियाच जेथे जातिवंत दगलबाज, तेथे दगलबाजी शिवाय जगणारे प्राणी म्हणजे षंढ, हिजडे, नामर्द, विद्वान आणि गुलाम हेच होत. या लोकांशिवाय, नेटका प्रपंच करून मरण्यापूर्वी वेळ सापडलाच तर परमार्थ-विवेकाचा फेरफटका करणारे छोटे दगलबाज संसारी, रोजच्या संसारांतल्या जगण्याच्या धडपडीत जे जे उत्पात करतात, त्यांचा विचार केला म्हणजे उलट्या काळजाच्या रंडीबाज (वारांगने) राजकारणातल्या बड्या दगलबाज दिग्गजांच्या उत्पातांचे प्रमाण सहज कळून येईल. साध्यासुध्या संसारात एकमेकांच्या मुंड्या मुरगाळल्याशिवाय जर संसा-यांना जगताच येत नाही; कापड मोजताना गजाला आणि माल तोलताना तराजूला हिसका दिल्याशिवाय जर आमच्या व्यापारांतला अपमृत्यू टळत नाही;
आणि ख-याखोट्याची भेसळ केल्याशिवाय, न्यायदेवतेने दिलेली न्यायाची कांजी पिण्याची जर मनुष्याच्या जिभेला सवयच नाही; तर कोट्यावधि लोकांच्या संसाराच्या बरेवाईटपणाचा जिम्मा घेणा-या राजकारणी संसाराच्या नायकाला शक्तीयुक्तीबुद्धीची ठेवणे कसल्या मनोवृत्तीच्या साच्यातून ओतून काढणे अगत्याचे असते, याची कल्पनाच करावी. जित-जेतृत्वाची घडामोड घडविणारे राजकारण हेच मुळी जेथे हरामखोरीच्या सट्टेबाजीचे क्षेत्र, त्या क्षेत्रांत स्वदेशाच्या भवितव्यतेचे खेळ खेळणा-या खेळाडूंनी, इंद्रधनिष्यालाही चक्कर येईल असा भरंसाट चित्रविचित्र रंगांत, हरामखोरीची आणि दगलबाजीची जुव्वेबाज रंगपंचमी खेळू नये, तर काय `सत्य वद धर्मचर’वाल्या बेदर्द गोसावड्याप्रमाणे राखेच्या ढिगाराची फाल्गुनी पौर्णिमा करावी? जगात आजपर्यंत अशी एकही राज्यसत्ता झालेली दाखविता येणार नाही की जिचा पाया दगलबाजीवर उभारलेला नाही. सत्यव्रताची आणि न्यायाची मिसाजच मारायच, तर एका राष्ट्राने दुस-या राष्ट्राला, गो-या लोकांनी काळ्या लोकांना, आणि पाश्चिमात्त्य लोकांनी पौर्वात्य लोकांना हव्या त्या उपायांनी जिंकून गुलाम करायचे, हा तरी कोठल्या गावचा न्याय? माणसांनी माणसांना ठेचून त्यांच्या गुलामगिरीवर स्वतःच्या जेतृत्वाची शेखी मिरविणे, हीच मुळी सृष्टीच्या नियमांची जेथे धडधडीत पायमल्ली, तेथे गुलामगिरीचे लोण सफाईत परतविण्यासाठी कोणी काट्यानेच काटा काढला, तर त्यात दगलबाजी ती कसली? जगाची रहाटीच जर उलट्या पावलांनी चालत आहे तर सुलटे चालण्यात शहाणपणा कोणता?
करत्याची करणी आणि मारत्याची तलवार
हीच जगाच्या जगण्याच्या धडपडीची गुरुकिल्ली आहे. याच गुरुकिल्लीने शिवाजीने महाराष्ट्राच्या नशिबाला चिकटलेली इस्लामी गुलामगिरी उध्वस्त करून, आपल्या मातृभूमीला हिंदवी स्वराज्याचे स्वातंत्र्य दिले. यात चुकले कोठे? दगलबाजी ती कसली? अत्याचार कसले? खून तरी कसले? आणि विश्वासघात तरी कोठे घुसले? खटास खट भेटे, तेव्हाच मनीचा संशय फिटे, हिंदू लोक आचंद्रार्क मुसलमानी सत्तेचे गुलाम राहणार काय? शिवाजीच्या या प्रश्नाला तत्कालीन प्रस्थापित राज्यसत्तेने `होय होय होय’ अशा मगरूरीच्या प्रतिध्वनीचे उत्तर दिले. त्यावर `कल्पांत करीन, पण ही मगरूरी टिकू देणार नाही हिंदू स्वतंत्र झालाच पाहिजे.’ अशी शिवाजीने धडाडीची उलट सलामी दिली. हिंदुस्थान आणि त्यावर राज्यसत्ता म्हणे मुसलमानांची! या दगलबाज परिस्थितीचा नायनाट करण्यासाठी शिवाजीला सवाई दिढी दुपटी दगलबाज बनल्याशिवाय गत्यंतरच नव्हते. प्रस्थापित मुसलमानी राज्यसत्तेचा विध्वंस हीच ज्याने आपल्या कर्तव्याची दिशा ठरविली, ज्या कर्तव्यात त्याने आपल्या वैयक्तिक स्वार्थाचा आमूलाग्र संन्यास केला आणि ज्या कर्तव्यसिद्धावर कोट्यावधि जीवांचा ऐहिक मोक्ष अवलंबून होता, त्या कर्तव्यासाठी – त्या गुलामगिरीचा कण्ठ काडकन फोडताना, अफझुलखानाचा काय, पण शिर्के, मोरे, जाधवासारखे स्वजातीय कंटक आडवे येताच, त्यांचेही खून पाडणे, शिवाजीच्या राष्ट्रधर्माला आणि राजकारणी नीतीला मुळीच विसंगत नव्हते. फार काय, पण विजापुराहून अफझुलखान आला, त्याच प्रतिज्ञेने व तयारीने शिवाजीचा प्रत्यक्ष बाप शहाजी जरी आला असता, तरी हिंदवी स्वराज्यस्थापनेच्या महत्कर्तव्यासाठी शिवाजीने त्याचाही कोथळा फोडून, आपल्या हाताने आपल्या मातोश्रींच्या कपाळचे कुंकू पुसायला कमी केले नसते. राष्ट्रोद्धाराच्या पवित्र कर्तव्यक्षेत्रात ध्येयाच्या सिद्धीसाठी `आडवा आला की काप’ हाच जेथे नीतीचा दण्डक आहे, तेथे `मातृदेवो भव, पितृदेवो भव’ या संसारी लोकांच्या आंबटवरणी नीतीचे नियम काय होत?
दगलबाजीशिवाय राज्यसत्ता नाही
आणि उलट्या काळजाशिवाय राजकारण नाही. स्वराज्यस्थापनेसाठी आणि परदेश जिंकून साम्राज्यवृद्धी करण्यासाठी आजपर्यंत दगलबाज्या केल्या नाहीत कोणी? सर्वीं केल्या. कोणीही नाकाला जीभ लावण्याचा खटाटोप करू नये. स्वतंत्र अमेरिकन संस्थआनांची प्राणप्रतिष्ठा; ब्रिटीश रक्ताच्या लोकांनी ब्रिटीस सत्तेला उलथूनच केली ना?
कोठे गेला तो रक्ताचा जिव्हाळा त्या वेळी? आर्यांनी जसा अनार्यांचा बीमोड करून हिंदुस्थानात तंगड्या पसरल्या, तद्वत् याच अमेरिकन वसाहतवाल्यांनी रेड इंडियनांच्या कत्तली व विध्वंस केला, तो शुद्ध युनिवर्सल ब्रदरहूड (विश्वबंधुत्वा)च्याच भावनेन काय? मुसलमानांनी सत्तामदाच्या धुंदीत हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचे बरेच तिखटमिठाचे वर्णन आपण बखरी; नाटके, कादंब-यांतून वाचतो. परंतु पोर्तुगीज, डच, इंग्रेज, फ्रेंच या क्रिस्ती राष्ट्रांच्या अरेरावांनी हिंदुस्थानात केलेल्या अत्याचारांपुढे ते कःपदार्थ ठरेल. पुर्तुगीजांचा प्रपितामह वास्को द गामा याने आपल्या दुस-या सफरीत झामोरीनच्या वतीने स्वागत देण्यास आलल्या ब्राह्मण वकिलाचे कान कापून तेथे कुत्र्याचे कान शिवले. आपल्या पुर्तुगीज राष्ट्राचा दरारा दाखविण्यासाठी बेसावध कालीकट बंदरावर तोफांचा भडीमार केला. बंदरांतील जहाजे लुटून, त्यांच्या ८०० नावाड्यांचे नाक कान कापले सोट्यांनी दात पाडले. तोडलेले सर्व अवयव ताटात भरून त्या ब्राह्मण वकिलाबरोबर `याची भाजी करून खा’ या निरोपासह झामोरीनकडे पाठविले. शिवाजीने अशा प्रकारची राक्षसी कृत्ये कधी कोठे केलेली असल्यास त्याच्या निंदकांनी खुशाल पुरावे पुढे आणावे. आल्फान्सो आल्बुकर्कने तिमय्या गरसप्पा नावाच्या देशद्रोही हिंदु राजाच्या मदतीने गोवा काबीज केल्यावर, आपल्या सत्तेचा वचक दाखविण्यासाठी तेथल्या मुसलमान रहिवाशांची व निरपराधी बायकामुलांची सर्रास कत्तल करून दिल्लीच्या नादीरशहालाही लाज आणली. क्रिश्चन धर्माच्या प्रसारार्थ उरल्यासुरल्या अनाथ मुसलमान विधवांची पोर्च्युगीज पुरुषांबरोबर बळजबरीची लग्ने ठोकून, गोव्यातील लोकविश्रुत हाफकास्ट पोर्च्युगीज प्रजा निर्माण केली. वेढ्यात सपडलेल्या किंवा लढाईत जिंकलेल्या वृद्ध, मुले व स्त्रियांबद्दल शिवाजीचा दयावंत दण्डक मशहूरच आहे. हिंदू देवळांच्या विध्वंसनासाठी नोरोन्हाने केलेली साष्टीतली कत्तल क्रिस्तीधर्माच्या व येशू क्रिस्ताच्या `प्रेमपूर्णत्वा’ला कशी काय साजली शोभली, हे क्रिस्ती धर्ममार्तडांनीच सांगावे. मुसलमानांच्या मशिदीबद्दल शिवाजीने हेच क्रिस्ती धोरण ठेवले असते, तर
म्युझिक बिफोर मॉस्क
मशिदीपुढे वाद्यांचा प्रश्न आज निघालाच नसता. पण शिवाजी म्हणजे हिंदुधर्माचा मूर्तिमंत मोहरा! पवित्र कुराण हाती पडताच तो त्याची पालखीत वाजतगाजत सन्मामपूर्वक परतवणी करीत असे. दक्षिणेतील कित्येक मशिदींना शिवाजीने दिलेली वर्षासने आजही चालू आहेत. दुसरे पुर्तुगेज अरेराव म्हणजे आजविडोसाहेब `हिंदुस्थानात त्याने केलेला दुष्टपणा अतर्क्य आहे. सीलोनातील जयप्राप्तीत त्याने आयांकडून त्यांचीमुले जात्यात घालू दळिली, शिपायांकडून काही मुळे भाल्याचे टोकांवर नाचवून, त्यांचे हाल पाहून तो आनंद मानी.’ धर्मप्रसारासाठी साधूंचे पेहराव केलेल्या क्रिश्चन हरामखोरांची राजकारणी कृष्णकृत्ये आम्ही पामर हिंदूने काय वर्णन करावी? युरोपियन संस्कृतीच्या व क्रिश्चन धर्माच्या तोंडाला आचंद्रार्क काळीमा फासणा-या इंक्विझिशनचे अत्याचार क्रिस्ती धर्म व सत्ताप्रसारक अरेरावांनी हिंदी लोकांवरही गाजविण्यास कमी केलेले नाही. डच लोकांनी आंबोयना येथे इंग्रज लोकांची केलेली कत्तल आणि टॉवरसन, बोमन्ट, जॉनसन, जॉन क्लार्क प्रभृतींवर केलेले पाशवी अत्याचार वाचले, तर दगडालाही पाझर फुटेल. पित्याने सर्वांगाला डागण्या देणे, उलटे टांगणे, पायास हातास कोपरावर खाकेत मेणबत्त्यांचे चटके देऊन मांस बाहेर काढणे, त्या जखमा धुवायच्या नाहीत, औषधपाणी करायचे नाही, मग त्यात किडे पडून दुर्गंधी सुटायची व किडे सर्व शरीरावर वळवळत फिरायचे असल्या `आंबोयना’ अत्याचारांची इंग्रेजाची आठवण कशाने बुजणार? पुर्तुगेज आणि डचांपेक्षा फ्रेंच आणि इंग्रेज जरा विशेष शहाणे.
दगडापेक्षा वीट मऊ
यांनीही अत्याचार केले नाहीत, असे नाही. पण, डावपेचाच्या दगलबाजीवर यांचा भर विशेष. शारीरिक अत्याचारांपेक्षा बौद्धिक अत्याचारावर त्यांची धोरणे फार. रॉबर्ट क्लाईव्हने वाटसन साहेबाची खोटी सही करून उमीचंदाला तर धडधडीत बनावट दस्तऐवजाने फसविले. वॉरन हेस्टिंग्जने अयोध्येच्या बेगमांचा केलेला छळ व इतर अत्याचार तर जगप्रसिद्धच आहेत. लॉर्ड डलहौसीने कलमांच्या फटका-याने आणि
तू नाही तर तुझा बाप
अशा सबबीवर मोठमोठी देशी राज्ये भराभर ब्रिटीश सत्तेच्या पचनी पडली. ५७व्या बंडातल्या हिंदी लोकांवरील इंग्रेजी अत्याचारांनी पुर्तुगेज डचांच्या आठवणीलाही मागे सारले. परवाची जालियनवाला बागेची कत्तल म्हणजे आंबोयनाचीच प्रतिमा नव्हे काय? या सर्व अत्याचारांच्या कृतघ्नतेपुढे आणि क्रौर्यापुढे शिवाजीने केलेला अफझुलखानाचा वध म्हणजे ढेकूण चिरडण्याइतकाच क्षुद्र ठरेल. शिवाजीवर किंवा सर्रास हिंदु नृपतीवर दगलबाजीचे आरोप करणा-या इंग्रज इतिहासकारांना रॉबर्ट क्लाईव्ह, वॉरन हेस्टिंग्ज, लॉर्ड डलहौसी इत्यादी अनेक राजकारणी महापुरुषांची कारस्थाने साजरी गोजरी वाटण्याचे आम्हाला तरी एवढेच कारण दिसते की, त्यांनी `दगलबाजी’ या ऊर्दू-मराठा शब्दाला `डिप्लोमसी’ हा एक गोंडस इंग्रजी शब्द प्रचारात आणलेला आहे. त्याच्या पोटात स्वर्गनरकासह सारे विश्व पचनी पडले तरी त्याला अजीर्ण म्हणून कधी व्हायचेच नाही.
डिप्लोमसी ऊर्फ दगलबाजी
ही राज्यक्रांतीची जनदेवता आहे. हिच्या उपासनेने स्वराष्ट्राच्या भाग्यसिंधूला अपरंपार भरती आणणा-या सर्व डिप्लोमॅटांची क्षुद्र लौकिकी नीतीच्या चव्हाट्यावर चिकित्सा करणे चिकित्सकांच्या क्षुद्र मनाचे द्योतक होय. डिप्लोमॅट ऊर्फ राजकारणी दगलबाजांना संसारीनीतीच्या दण्डकाखाली खेचले, तर पृथ्वीवरील कोणत्याही चक्रवर्ति नृपतीच्या आणि लोकशाहीब्रुव राज्यसत्तेच्या तोंडाला फासायला काळ्याशिवाय दुसरा रंगच इरणार नाही. अर्थात् स्वराज्यसंस्थापक आणि साम्राज्य-प्रसारक राष्ट्रवीरांच्या चारित्र्याकडे पहाण्याची
ही दृष्टीच चुकीची आहे
स्वदेशाच्या सौभाग्याचे आणि स्वातंत्र्याचे अत्युच्च आणि व्यापक ध्येय साधण्यापलीकडे राष्ट्रवीरांना स्वतःचा स्वार्थ असा काहीच नसतो. स्वार्थाचा संन्यास करू कोट्यवधि स्वदेश बांधवांच्या हितासाठी झगडताना, त्यांच्या हातून घडतील त्या ब-या वाईट कृत्यांची परीक्षा संकुचित अशा संसारी नीतीच्या दुर्बिणीतून करणे, सपशेल चुकीचे आहे. पुष्कळ वेळा राष्ट्रसेवेच्या व्यापक ध्येयासाठी झगडणा-या जातीवंत क्षुद्रांकडून अमानुष कृत्ये घडतात, नाही असे नाही. म्हणून काय या सा-या स्वराज्य व स्वधर्म सेवकांना क्षुद्र लेखायचे? हे अत्याचार त्यांनी काय स्वार्थासाठी केले? स्वार्थच मानायचा तर तो इतका महासागरासारखा आहे की, त्यात त्यांच्या दोषांचे प्रमाण म्हणजे दर्यामें खसखस! कोणत्याही राज्यसत्तेच्या पायातले दगडधोंडे माती उकरून पाहा, त्यात खून, रक्तपात, अत्याचार, विश्वासघात यांशिवाय दुसरे काहीच आढळणार नाही. परराज्यांच्या मुंड्या मुरगाळल्याशिवाय स्वराज्याची मान ताठ बसत नाही, परक्यांच्या घरादारांच्या होळ्या केल्याशिवाय आपल्या राजसत्तेच्या महात्म्याची दिवाळी साजरी होत नाही. बळी तो कान पिळी कम-दगलबाज ऊर्फ बेअकक्ल लोकांनी सवाईसोट्या दगलबाज लोकांच्या सत्तेखाली निमूटपणे चेचले जावे, हा निसर्गाचा दण्डकच आहे. तात्पर्य, दगलबाजी हा यच्यावत् सर्व राज्यसंस्थापकांचा मुख्य सद्गुण आहे. हा सद्गुण ज्यांच्या अंगी विशेष तेच पुरुषोत्तम प्रत्येक देशाच्या नवमन्वंतराचे शककर्ते म्हणून इतिहासात चिरंजीव होऊन बसले आहेत. विश्वासघात, बेइमान, खून, अत्याचार, जाळपोळ इत्यादि गोष्टी पौराणिकी ग्रंथांच्या किंवा शाब्दिक वादाच्या क्षेत्रात अत्यंत अमानुष मानलेल्या असल्या, तरी राजकारणी क्षेत्रांत त्यांची सद्गुणांतच गणना होत असते.
शांतीसाठी महायुद्ध
ही शब्द योजना तरी किती परस्परविरोधी? रक्तपात टाळावे म्हणून रक्तपात. चो-या बंद व्हाव्या म्हणून घरादारांवर दरवडे. राजावर प्रेम करावयास शिकवण्यासाठी राजद्रोहाच्या खटल्याची सत्रे. ही वाक्ये सकृद्दर्शनी नागव्या विरोधाभासाची दिसतात. पण त्यातच वास्तविक राजकारणी दगलबाजीच्या सद्गुणांचे खरे बीज आहे. नदीच्या मुळाप्रमाणे आणि ऋषीच्या कुळाप्रमाणे कोमत्याही राजसत्तेचे मूळ शोधण्यात अर्थ नाही. या मुळात कसकसली खते पडलेली असतात. त्याचे पृथःकरण भल्याने करू नये. म्हणूनच राजकारणपटू आंग्ल मुत्सद्दी एडमंड बर्क याने `सर्व राजसत्तांच्या उगमांवर पावित्र्याचा पडदा सोडून देणेच श्रेयस्कर आहे’ असा इषारा दिलेला आहे.
राजकारणात कितीही घातपात आणि दगलबाजी असली, तरी अखेर ते विजयी व्हावे लागते. ते विजयी झाले तरच त्या दगलबाजीवर आणि घातपातावर पडदा पडतो. इंग्रेजीत एक सूत्र आहे :- `One murder makes a villsin, thousands a warrior’ एक खून केला की माणूस खुनी ठरतो, आणि त्याने हजार खून पाडले की तो वीर योद्धा म्हणून गणला जातो. या छोट्या सूत्रांत बडा वेदान्त आहे. स्वदेशाच्या स्वातंत्र्यांसाठी राजकारणी दगलबाजीने झगडणाराला यशापयशाची पर्वा नसली, तरी त्याची केव्हाही हमी देता येत नाही. बोलन चालून ती सट्टेबाजी. `सरळ पडे दान, त्याची जगात ताठ मान’ `दान पडे वाकडे, त्याच्या जिवावर साकडे.’ यंग टर्की नावाची एक पार्टी काढून राजक्रांती करू पाहणारा केमालपाशा सुरुवातीला `अपस्टॉर्ट अनार्किस्ट’ उपटशुंड बंडवाला म्हणूनच मानला गेला होताना! पण त्याच्या शिकंदर नशिबाने त्याच्या तलवारीला सरळ दान देताच, आज त्याचा महिमा केवढा वाढला तो पहा आण वाकडे दान पडलेल्या रिफांचा पुढारी अबदुल करीम याची काय अवस्था झाली ती पहा. दोघांचे उद्देश एकच. दोघेही मर्द लढवय्ये. दोघेही पट्टीचे राजकारणी दगलबाज. पण यशापयशाच्या चढत्यापडत्या झोल्यात एक `जवानमर्द मुस्तफा’ बनला आणि दुसरा बाबू चष्मेवाल्याच्या सदरात पडला! एवढा मोठा शककर्ता चक्रवर्ति नेपोलियन, सा-या युरोपातले राजेशाहीचे मुकुट टाचेखाली चिरडणारा लोकशाहीचा प्रणेता. पण अखेर स्वदेशद्रोह्यांच्या कारस्थानामुळे वॉटरलूच्या समरांगणावर त्याचे हुकमी दान हुकताच इंग्रेज जेत्यांनीत्याची कशी काय विल्हेवाट लावली? इंग्रेजी राजनीताचे खरे स्वरूप या एकाच गोष्टीवरून फार स्वच्छ कळून येते. हिंदुंची राजनीति पडत्या प्रतिस्पर्ध्यांचा सन्मान राखते, तर प्रतिस्पर्धी पराभूत होताच आंग्ल राजनीति त्याला रसातळाला नेते. भारतीय महायुद्ध संपल्यावर विजयी पांडवांनी धारीतीर्थी पतन पावलेल्य कौरवांना श्रद्धापूर्वक तिलांजुली व पिंडदान केले. इंग्रेजाच्या सांकृतिक इतिहासात श्रद्धेची ही भावनाच नसल्यामुळे, ते कधी आपल्या पराभूत प्रतिस्पर्ध्याला पिंडदान तर करणार नाहीतच, पण दुसरा कोणी ते करील तर तेही त्यांच्या प्रवृत्तीला परवडत नाही. नेपोलियन, जोन ऑफ आर्क, शिवाजी वगैरे थोरथोर राष्ट्रवीर वीरांगनाबद्दल आंग्लेतिहासकार जे इतक्या क्षुद्रतेचे आणि उपहासाचे उद्गार काढतात, त्याचे मूळ या त्यांच्या आनुवंशिक संस्कृतीत आहे. आजला प्रत्येक देशी संस्थानाकडे क्षुद्रतेच्या दृष्टीने पाहण्याची जी एक इंग्रेजी आनुवंशिक संस्कृतीच्या शाबरी सांसर्गाचाच परिणाम होय. आयर्लंडच्या भवितव्यतेत क्रांती घडविणारा डि. व्हॅलेरा इटलीच्या भाग्याची घटना करणारा मुसोलिनी यांच्याविषयी नित्य बाहेर पडणारे आंग्लोद्गार यांची छत्तिशी स्पष्ट सिद्ध होते. या छत्तिशीत शिवाजी दगलबाज ठरला तर त्यातही त्या राष्ट्रवीराचा सन्मानच होत आहे कारण
शिवाजी विजयी दगलबाज होता.
हिंदुस्थानात एक वेळ दगलबाज आर्यांनी कम-दगलबाज अनार्यांना पादाक्रांत केले. त्यानंतर, हिंदू राज्यकर्त्यांची दाणादाण उडवून मोंगलांनी आपली दगलबाजी वरचढ ठरविली. पुर्तुगेज, फ्रेंच, डच व इंग्रेज यांमध्येही परस्पर दगलबाजीच्या शर्यती लागून, त्यात अखेर इंग्रेजाचा घोडा पहिला आला.
काही वर्षे दख्खनच्या मुसलमानीशाह्या `आम्ही पट्टीचे दगलबाज’ म्हणून महाराषश्ट्रभर आपल्य सत्तेचा धुमाकूळ घालीत होत्या. शिवाजीने बोलबोलता त्या सत्तेला उद्धव्स्त करून खुद्द दिल्लीच्या काळजाला हात घातला आणि मुसलमानांपेक्षा आम्ही
मऱ्हाठी दिढी दुपटी दगलबाज
आहोत, याची जाहीर नौबद रायगडावरून ठोकली. पुढे म-हाठशाही दगलबाजीचा धौशा पेशव्यांनी थेट अटकेला नेऊन भिडविला. अखेर इंग्रेजांच्या मार्जार-तपश्चर्येव नियतिदेवीची बहाल मर्जी झाली. त्यांनी म-हाठे, मोंगल, सीख, राजपूत इत्यादि सर्व दगलबाजोपदगलबाजांना आपल्या तंत्रशक्तीने चीत करून ब्रिटीश सत्तेच्या बिनमुखी स्थापनेने, चालू युगात.
इंग्रज म्हणजे दगलबाजाग्रणी
ऊर्फ मास्टर डिप्लोमॅट्स हा सिद्धांत बनतोड प्रस्थापित केला. आज इंग्रेजाच्या दगलबाजीला जोड नाही आणि तोडही नाही. आज तिला अवघे त्रिभुवन थोडके पडले आहे. सर्व जगातले राजकारण आज इंग्रेजी दगलबाजीच्या पाणपोयीवरच आपल्या उलटसुलट पेचांचे पाणी पीत असते. या पाण्याला पाणी पाजण्याचे पाणी आज कोणांतही नसल्यामुळे, इंग्रजेतर सर्व राष्ट्रे पाण्यापेक्षा पातळ झालेली आहेत. आज पाश्चिमात्य इंग्रेज लोक ठरवतील ती पूर्व ठरत आहे. ब्रिटीश साम्राज्याचा हा विस्तार व दरारा प्रस्थापित करण्याच्या कामी लक्षावधि इंग्रेजांनी स्वार्थाचा होम केलेला असल्यामुळे, त्याच्या पायात पडलेल्या अनंत अत्याचारांना व घातपातांना आज मानवी स्मृति कवडीचेही महत्त्व देत नाही.
यावर कित्येक अशी शंका काढतील की जी कामे नीतिग्रंथांत अकर्मे अथवा कुकर्मे म्हणून गणली जातात, ती उघड माथ्याने आचरून नरपति, हयपति, छत्रपति, चक्रवर्ती इत्यादि अत्युच्च पदाला पोहचणा-या पुरुषांना थोर का मानावे? केवळ ते जबरदस्त सत्ताधीश बनतात म्हणून की काय? नीति, न्याय, सदाचार यांना लाथाडून मिळविलेल्या श्रेष्ठ पदाची महती जगाने काय म्हणून वानावी, आणि इतिहासाने ती मानावी? हव्या त्या अमानुष अत्याचारांवर व घातपातांवर केवळ राजकारणाची सफेदी चढताच त्यांच्या क्रौर्याची आणि राक्षसीपणाची तीव्रता वितळून जाते, तर मानवतेचा सुरक्षितपणा म्हणजे एक भयंकर धोक्याचा सौदाच म्हटला पाहिजे! वाटेल ते कुकर्म राजकारणाचा शिक्का पडताच, चलनी नाण्याप्रमाणे जर जगाच्या बाजारात बिनतक्रार चालते, तर
नीतिशास्त्र म्हणजे नाटक का तमाशा?
सत्कर्म ते सत्कर्म आणि बदकर्म ते बदकर्म! सकृद्दर्शनी ही शंका वाजवी दिसते. परंतु – त्यात एक `परंतु’ आहे आणि या `परंतु’चे कोडे शेकडा ९९ प्रापंचिकांना उलगडत नसल्यामुळे, कर्म कोणते आणि कर्म कशाला म्हणावे, याचा समाधानकारक निर्णय त्यांना लावता येत नाही. संसाराच्या रोजच्या क्षुद्र दलमलीतसुद्धा `हे बरे का ते खरे’ `असे करू का तसे करू’ आणि `कसे करू काय करू’ याचा माणसाला उलगडा होत नाही मोठमोठ्या पंडितांचीही निर्णयशक्ती पुष्कळ वेळा लंजूर पडते. अशा वेळी मोहग्रस्त माणूस वाटेल त्यावर वाटेल ते आरोप करून, आपल्या संशयी मनाचे कसे तरी समाधान करून घेतो. अहिंसा सत्य, अस्तेय, कायावाचामनाची शुद्धता आणि इंद्रिय-निग्रह ही पांच सनातन नीतिधर्माची तत्त्वे खरी; परंतु त्यांच्याही आचरणात अपवादांची अनेक स्थळे आहेत. सामान्य नियम आणि अपवाद यांचा पाया शुद्ध आणि विवेकमान्य विचार नीतिशास्त्राने मुळीच केलेला नाही, असे खास नव्हे. अहिंसा परमो धर्मः ही गोष्ट कितीही खरी असली तरी जगाच्या व्यवहारात कर्तव्याची अशी अनेक क्षेत्रे आहेत की तेथे हिंसा हाच परम धर्म ठरविणे प्राप्त असते; आणि नीतिशास्त्र त्यालाच आपली मान्यता देते. संसार – मग तो का कुटुंबाचा असो वा विशाळ राष्ट्राचा असो – त्यांत नित्य भेटणा-या कर्माकर्मांची त्रांगडी कशी सोडवावी, याचा बालबोध उलगडा अखिल मानवतेला व्हावा एवढ्याचसाठी
श्रीमदभगदवद्गीताशास्त्र अवतरले
आहे. सर्व उपनिषदरूपी कामधेनूंचे अमृतमय दूध घुसळून, श्रीकृष्ण भगवंताने गीतारूपी आत्मप्रबोधक नवनीत काढले कै. बाळ गंगाधर टिळक यांनी अत्यंत कुशलतेने त्या नवनीतात आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेची पत्रीची खडीसाखर मिसळून `गीतारहस्य’ नामक स्वादिष्ठ आणि खमंग असा षोडश रसी मावा तयार केला. त्यांतील `कर्मजिज्ञासा’ नामक प्रकरणावरून सत्य-असत्यांची व हिंसा-अहिंसेची गीतोक्त मीमांसा येथे साराशाने नमूद करीत आहो.
नीतिशास्त्र कितीही कडकडीत असले, तरी त्यातही अपवादांचा विवेकाने विचार केलेला आहे. सामान्य नियमाला अपवाद हे असायचेच. सत्य बोलावे हा परम धर्म. त्याविषयी वादच नाही. परंतु, आजुबाजूचा कसलाही विचार न करता, परिस्थिती प्रसंग आणि परिणाम यांची दखल न बाळगिता, केवळ परमोच्च धर्म म्हणून सत्य बोलणारा माणूस सत्याग्रही असला तरी पुष्कळ प्रसंगी स्वतः गाढव तर ठरतोच, पण इतरांच्याही नाशाला अगर घाताला कारण होतो. गाईच्य मागे कसायी लागला आहे. पळत पळत गाई पल्या द्रष्टीसमोर आडोशाला लपली. इतक्यात `गाई कोठे लपली?’ म्हणून कसायी तुम्हाला विचारू लागला.
तर त्या वेळी सत्याग्रहाच्या दिमाखाने तुम्ही सत्य सांगून गाईची हत्या करवाल, का असत्य सांगून तिचा प्राण वाचवाल? काही मनुष्ये दरोडेखोरांच्या हातून निसटून, तुमच्यादेखत दाट रानात कोठेतरी दडून बसली. मागाहून तलवारी परजीत दरवडेखोर येऊन तो मानसे कोठे गेली, असे विचारू लागले. तर काय जबाब द्याल? सत्य बोलाल का धडधडीत `मला माहीत नाही’ असे असत्य बोलून त्या गरीबांचा प्राण वाचवाल? सत्य बोलणे हा परमोच्च धर्म, तर निरपराधी प्राण्याची हिंसा होत असेल तर त्याला हवे ते करून प्रतिबंध करणे, हाही सत्याइतकाच परमोच्च धर्म! मग दोहोंपैकी कोणता मार्ग पत्करावा? समजा, अखिल महाराष्ट्राच्या गुलामगिरीचे पाश कसे तोडावे, या एकाच ध्येयाला वाहून घेतलेले शिवाजी महाराज डोंगरी किल्ल्यांच्या एका गुप्त खलबतखान्यात काही मसलत करीत बसले आहेत. बाहेर टेहळणीसाठी एक घोंगड्या गुराखी बसविलेला आहे. इतक्यात एक विजापूरचा कोणीतरी चिरुट सिगारेटखान तेथे येतो आणि तलवार काढून विचारतो, `बताव कहा है मरगठ्ठा सिवाजी’ तर त्या घोंगड्या टेहळ्याने, `सत्य सदा बोलावे’ म्हणून शिवाजीचा चटकन पत्ता सांगून मोकळे व्हावे, का कानावर हात ठेवून त्या चिरुटखानाच्या तलवारीला बळी पडावे? नीतिशास्त्रातला विवेक दुस-या प्रकाराला संमति देतो. ``सत्य बोलणे हे प्रशस्त होय; पण सत्यापेक्षाही सर्व भुतांचे ज्यांत हित असेल, ते बोलावे. सर्व भुतांचे ज्यात अत्यंत हित तेच माझ्या मते खरे सत्य होय.’’ चिरूटखानाच्या क्रोधाला टेहळ्या बळी पडला तर त्यात विशेष काय उत्पात घडणार? काही नाही. एक सोडून लाख टेहळे मिळतील पण कोट्यवधि म-हाट्यांच्या राष्ट्रीय भवितव्यतेचा विश्वकर्मा शिवाजी दुसरा मिळणे शक्यच नाही. शिवाजी ठार झाला की महाराष्ट्र मेला अशा महत्त्वाच्या राष्ट्रनायकाला जर त्या टेहळ्याने दाखविला, तर त्याची ती वाणी अथवा करणी असत्याच्या व नीच नृशंसत्वाच्या सदराखाली येऊन सा-या जगाच्या छीःथूःला कारण होती. शनिपर्वात भीष्म युधिष्ठिरास सांगतात, ``न बोलता मोक्ष म्हणजे सुटका होम्यासारखी असेल तर काही झाले तरी बोलू नये; आणि बोलणे अवश्यच असेल तर, किंवा न बोलल्यामुळे (दुस-यास) शंका येण्याचा संभव असेल तर, त्या वेळी सत्यापेक्षा खोटे बोलणे अधिक प्रशस्त, असे विचारांती ठरलेले आहे.’’ `अहिंसा सत्यवचन् सर्वभूतहितं परम्’ (वनपर्व २०६-७३) इंग्रेजी नीतिशास्त्रवेत्ते याच मताला पुष्टी देतात. [१] मी खोटे बोलल्याने प्रभूच्या सत्याचा महिमा जर अधिक वाढतो (म्हणजे क्रिस्ती धर्माचा अधिक प्रसार होतो.) तर त्यामुळे मी पापी कसा ठरणार? (रोम ३-७ क्रिस्तशिष्य पॉल.) [२] माझ्या मते कोणत्याही कृत्याचा परिणाम काय होतो इकडे लक्ष पुरवूनच त्याची नीतिमत्ता ठरविली पाहिजे. खोटे बोलल्यानेच एकंदरीत अधिक कल्याण आहे अशी जर माझी खात्री असेल तर सत्य बोलण्यास मी धजणार नाही; आणि ही खात्री अशा प्रकारचीही असू शकेल की त्यावेळी खोटे बोलणे हेच माझे कर्तव्य आहे असे मी समजेन. (लेस्ली स्टीफन) अहिंसा परमो धर्मः हा सामान्य नियम बहुतेक सर्व धर्मांनी मान्य केलेला आहे. ``मातृवध, पितृवध, मनुष्यवध हे हिंसेचे घोर प्रकार. पण आता असे समजा की, आपला जीव घेण्यास, किंवा आपल्या पत्नीवर अगर कन्येवर बलात्कार करण्यास, अथवा आपल्या घरास आग लावण्यास, अगर आपली सर्व दौलत व स्थिरस्थावर हरण करण्यास एखादा दुष्ट मनुष्य हातात शस्त्र घेऊन सज्ज झाला व जवळ दुसरा कोणीही त्राता नाही, तर असल्या `आततायी’ मनुष्याची आपण `अहिंसा परमो धर्मः’ म्हणून डोळे मिटून उपेक्षा करावी, किंवा दुष्टास – तो सामोपचाराने ऐकत नसल्यास – यथाशक्ती शासन करावे?’’ मनु म्हणतो–
गुरुं वा बालवृद्धौ वा ब्राह्मणं वा बहुश्रुतम् ।
आततायोनमायान्तं हन्यादेवाविचारयन्।।
``असला आततायी म्हणजे दुष्ट मनुष्य – तो गुरु आहे, म्हातारा अगर पोर आहे, विद्वान ब्राह्मण आहे, इकडे न पहाता – बेशक ठार करावा!’’ कारण, अशा वेळी हत्येचे पाप हत्या करणारास लागत नसून, आततायी आपल्या अधर्मानेच मारिला जातो (मनु. ८-३५०)... भ्रूणहत्या म्हणजे कोवळ्या पोराची हत्या सर्वांत अति गर्ह्य मानिली आहे; पण आडवे आले म्हणजे कापून काढावयास नको काय?’’ [कै. टिळक] तात्पर्यं, नीतीचे सामान्य नियम काहीही असले, तरी त्यातही अपवाद असतात आणि आपल्या बोलण्याने किंवा वर्तनाने सार्वजनिक ऊर्फ सर्वभूतहितावर होणा-या ब-यावाईट परिणामांवरून त्यांतील विवेका विवेक शोधला पाहिजे.
शिवाजीचे ध्येय काय होते?
शिवाजी काय मुसलमानांचा द्वेष्टा होता? मुळीच नाही. तो कोणाचाच द्वेष्टा नव्हता. शिवाजीची मायभूमी गुलाम होती. त्या गुलामगिरीचा तो द्वेष्टा होता. आणि गुलामगिरीचा द्वेष करून, तिला रसातळाला नेण्याचा यत्न करणे, हा तर प्रत्येक मनष्याचा निसर्गदत्त अधिकारच आहे. लौकिकी धर्मापेक्षा हा राष्ट्रस्वातंत्र्याचा धर्म उद्दिपित करणे, हे मोठे कौतुकास्पद कार्य होय. शिवाजीला हे महत्कार्य पार पाडावयाचे होते. महाराष्ट्र म-हाठ्यांचा. त्यावर इस्लामी सत्ता काय म्हणून? म-हाठ्यांच्या राजकारणी स्वयंनिर्णयाचे हे इस्लामी मक्तेदार कोण? यांची मक्तेदारी आम्हाला साफ नको. मी म-हाठ्यांना दास्यमुक्त करीन. या उदात्त महत्त्वाकांक्षेने बालवयातच फुरफुरलेल्या शिवाजीला प्रत्यक्ष कार्य करताना येणा-या संकटांचा, अखिल महाराष्ट्राच्या भवितव्यतेच्या जबाबदारीकडे काग्र लक्ष ठेवून, बनेल तसा फडशा पाडणे कर्तव्यप्राप्तच होते. त्याने अफझुलखानाचा कोथळा फोडला तो, तो मुसलमान म्हणून नव्हे. अशी समजूत करून घेणे हा गाळीव गाढवपणा होय. अफझुलखानाच्या स्वारीचा उद्देश, त्याने विजापुरास मारलेली पैज. येताना वाटेत केलेले अत्याचार, आणि शिवाजीविरुद्ध रचलेला व्यूह न जाणण्याइतका शिवाजी बावळट नव्हता. अफझुलखान म्हणजे महाराष्ट्राच्या उदयोन्मुख स्वातंत्र्यावर प्रस्थापित अदिलशाही सत्तेने फेकलेला बांबगोळाच होय, ही त्या तरुण राष्ट्रवीराची बालंबाल खात्री पटल्यामुळेच, शिवाजी आपल्या कर्तव्याची दिशा ठरवूनच, त्याच्या डावाशी प्रतिडाव खेळला, आणि अखेर अतुल्य प्रसंगावधानाने त्याने त्याला त्याच्याच युक्तीने गारद करून, शिवाजीचा महाराष्ट्र – स्वातंत्र्याचा उद्योग म्हणजे सहजगत्या टाचेखाली विझणारी ठिणगी नव्हे, हे त्याने विजापूरच्या प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिले.
शेक्सपियरच्या हॅम्लेटला गीताशास्त्राचे पाठबळ नव्हते, म्हणून त्याच्या `जगावे का मरावे?’ या शंकेचे पर्यवसान दुःखपर्यवसायी झाले. हिंदुजन गीतेशी बेइमान झाले, म्हणून आज ते सा-या जगाच्या पखालीचे बैल बनले आहेत. प्रत्येक राष्ट्रसंसा-यापुढे `जगावे की मरावे?’ हाच प्रश्न नेहमी पडत आलेला आहे आणि तो सोडवियाच्या कुशलतनेचे त्या त्या राष्ट्राच्या उन्नति अवनतांचा इतिहास रंगविलेला आहे. आज प्रत्येक गुलाम राष्ट्रापुढे हाच प्रश्न आहे, आपल्यापुढे तोच आहे. शिवाजीपुढे तोच होता. आणि अर्जुनापुढेही तोच होता. अर्जुनालासुद्धा कर्म कोणते आणि अकर्म कोणते, हाच मोह पडला होता. त्याने मन साधुत्वाच्या कल्पनेने वितळू लागले होते. आणि राजकारणपटू मुत्सद्याप्रमाणे श्रीकृष्णाने वेळीच त्याच्या भ्रमाचे निरसन केले नसते, तर अर्जुनाच्या कपाळी नामर्द षंडत्वाचा काळिमा कायमचा लागला असता. भारतीय महायुद्ध हिंदूहिंदुंतले होते. एकाच राजघराण्यातल्य दोन `चुलत’ तटातले होते. आप्तस्वकीयांतील रक्तपाताचा प्रसंग. कौरव किंवा पांडव यांपैकी कोणातरी एकाच विध्वंस झाल्याशिवाय भरतखंडाच्या राष्ट्रीय भवितव्यतेचा महत्त्वाचा प्रश्न सुटणारा नव्हता. अर्जुनाच्य समोर सारा गोतावळा युद्धासाठी सज्ज उभा. भीष्म, द्रोणासारखे पूज्य गुरुवर्यही सामन्याला समोर. अहिंसा परमो धर्मः! मग यांच्यावर शस्त्र चालवावे की नाही? हा सारा गोतावळा ठार मारून मी मिळवणार काय भारत साम्राज्य? त्यापेक्षा संन्यास काय वाईट? युद्धातील रक्तपात व अत्याचार हे कर्म का अकर्म?
असल्या लौकिकी विचारांनी अर्जुन भांबावून गेला. त्याला राजकारणी दगलबाजी म्हणजे मोठे पाप वाटू लागले. साध्या संसारी माणसाप्रमाणे महायुद्धाच्या उद्देशाकडे व त्यातल्या अत्याचारांकडे पाहू लागला. त्यामुळे नीति, न्याय, धर्म, सत्य यांची विकृत रूपे त्याला दिसून, कर्तव्याकर्तव्याचा त्याला विवेकच उरला नाही. मिथ्या साधुत्वाच्या कल्पनेने अर्जुनाच्या पौरुषत्वाला अविवेकाची लागत असलेली वाळवी झाडण्यासाठी श्रीकृष्णाला किती तरी प्रयत्न करावे लागले. नीती सांगितली, विवेक पढवला. अखेर दमदाटीसुद्धा केली, तेव्हा कोठे हे सव्यसाठी धनंजय युद्धाला प्रवृत्त झाले. आता शिवाजीकडे पाहा. ``हिंदवी स्वराज्य व्हावे हे श्रींच्या मनात फार आहे.’’ या ध्येयाच्या सिद्धीसाठी झगडताना शिवाजीवर अनेक प्राणघातक व ध्येयविध्वंसक प्रसंग आले. परंतु, प्रत्येक मुकाबल्याला तो आपल्या कर्तव्याचा मार्ग स्पष्ट आखूनच त्याला बेधडक स्वतः तोंड देत गेला. शाहिस्तेखानावरील मुकाबला घ्या, अफझुलखानाच्या दगेबाजीवर केलेली मात घ्या, शहाजी राजाच्या सुटकेसाठी केलेले कारस्थान घ्या, आग-याहून निसटण्याची योजना घ्या, काय वाटेल तो प्रसंग घ्या, त्यात कर्तव्याची स्पष्ट कल्पना करून निधड्या छातीने शिवाजी त्याचा फडशा पाडीत गेला. अर्जुनाप्रमाणे शिवाजी कधी भांबावला नाही. कधी संन्यास घ्यायला उठला नाही.
बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी
या तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समर भूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझुलखानापुढे उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली, तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो, काका, मामा, आप्पा, बाबा यांना कसे मारू या क्षुद्र कल्पनेला बळी पडून, विहित कर्तव्याला बगल मारून पळू पाहणारा बगलबाज अर्जुन पाहा आणि भेटीचे ढोंग करून दगा देण्यास आलेल्या दगलबाज अफझुलखानाला त्याच्याच युक्तीने गारद करणारा कर्तव्यतत्पर सवाई दगलबाज शिवाजी पहा, म्हणजे कर्तव्याकर्तव्याचे कोडे थोडे तरी सुटेल. अफझुलखान ठार मारल्याशिवाय किंवा त्याच्या हाती शिवाजी जिवंत किंवा मेलेला सापडल्याशिवाय; त्या मुकाबल्याचा निर्णयच लागणारा नव्हता. अर्थात शिवाजी मारीन किंवा मरेन असा अटीतटीचा सामना देण्याच्या तयारीनेच प्रतापगड चढला; आणि त्याच्या अलौकिक प्रसंगावधानाने त्याने अशक्य गोष्ट शक्य करून दाखविली. हिंदवी स्वराज्याच्या प्राणप्रतिष्ठेसाठी स्वतःचा प्राण देणे अथवा अफझुलखानाचा प्राण घेणे, यापेक्षा तिसरा मार्गच शिवाजीपुढे नव्हता. अर्थात ते कर्तव्य त्याने मोठ्या कुशलतेने पार पाडून, `योगः कर्मसु कौशलम्’ या गीतोक्तीप्रमाणे राजकारणी
दगलबाजांतील योगीराज
ही आपली कीर्ती जगजाहीर केली. श्रीकृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला, पण ती प्रत्यक्ष आचरणात आणून महाराष्ट्राचा राष्ट्रधर्म भगवद्गीतेत आहे, हे सप्रमाण सिद्ध केले शिवाजीने. गीतेचे पांग पांडवांनी फेडले नाहीत, ते शिवाजीने फेडले. महाभारतीय इतिहासाला आपल्या बुद्धिभावाने रंगवून चिरंजीव करणा-या दगलबाज श्रीकृष्णाला अर्जुनापेक्षा दगलबाज शिवाजी हाच खरा शिष्य व अनुयायी लाभला, यांत मुळीच संशय नाही. अर्थात ``यत्न योगेश्वर कृष्णः’’ हा श्लोक या पुढे –
यत्र योगेश्वर कृष्णो यत्र शिवराय भूपति ।।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।।
असाच वाचला पाहिजे, बोला –
दगलबाज शिवाजीचा जयजयकार