prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
हे पुस्तक मुंबई – भायखळा – परेल रोड, घर नंबर ३५५४, तत्त्वविवेचक छापखान्यांत रा. विठ्ठल तानाजी मोडक यांनी छापिलें, तें रा. केशव सीताराम ठाकरे, यांनी २० मिरांडाची चाळ, मुंबई नं. १४ येथें प्रसिद्ध केले.
All rights reserved
ह्या नंतर ह्या भिक्षुकशाहीच्या बंडाला शह देणारे धर्मवीर म्हटले म्हणजे रामानंद, चैतन्य, कबीर आणि ज्ञानेश्वरादि महाराष्ट्रीय संतच होत आजपर्यंत भिक्षुकशाहीनें सातकुलपांत दडपून ठेविलेले संस्कृत ग्रंथभाण्डार यांनी खुले करून आपआपल्या देशीभाषेच्या द्वारे तें आचांडाळ ब्राम्हण वर्गास वाटून दिलें आणि हें भाण्डार देवाच्या घरचें आहे, एकट्या मिक्षुकशाहीची मालकी त्यावर नाहीं असें जगजाहीर करून, बंडखोरांनी त्या ग्रंथभांडारावर आजपर्यंत गाजविलेल्या एकमुखी सत्तेचा जोमकस भाषेत निषेध केला. भिक्षुकशाहीनें त्यांच्या बंडास शह देऊन, जन्माच्या पायावर उभारलेल्या जातिभेदाचा आणि मानवी समाजात ह्या जातिभेदामुळे दृढमूल झालेल्या विषमभावाचा धिक्कार करणाऱ्या ह्या सत्पुरुषांचा कसाकसा छळ केला, तें आमच्या वाचकांस आम्हीं आज नव्यानें सांगितले पाहिजे असें नाहीं. एकनाथाच्या उपदेशानें तर ह्या बंडखोरांची फारच धांदल उडविली. पैठण म्हणजे त्यावेळच्या बंडखोरांचा पांजरपोळ, तेथलेच भिक्षुक जेव्हां सकामकर्मे नाचरती कोणी आमुची मिळकत बुडविली। असें म्हणून एकनाथांच्या नावानें खडे फोडू लागले आणि त्याला आपला दावेदार म्हणू लागले, तेव्हा इतर ठिकाणच्या बंडखोरांची दशा काय विचारावी ! इतके झाले तरी ह्या बहाद्दरांनी ज्ञानेश्वरादि भावंडांप्रमाणें एकनाथाचाहि छळ करावयास कांही कमी केलें नाहीं. यूरोपांतल्या भिक्षुकशाहीप्रमाणे आमच्या देशांतल्या धर्मोद्धारकांना आमच्या देशांतील भिक्षुकशाहीने जाळून किंवा विणून ठार केले नाही इतकेंच; बाकी (श्री टिपणीसांच्या या शंकेच्या निरसनार्थ त्यांनी व वाचकांनी ‘ग्रामण्यांचासाद्यंत इतिहास पृ.१८६-१८८व प्रस्तुत पुस्तकांतील पृ.४२ वरचा खुलासा अवश्य वाचावा. कोणावर पूर्ण बहिष्कार घालून, तर कोणाच्या अंगावर थुंकून, कोणाला मार झोड करून, तर कोणाचे ग्रंथ बुडवून त्यांनी त्यांचा दावा पुरा साधला यात काही शंका नाही.
रामदासांची गोष्ट या उपरिनिर्दिष्ट संतापेक्षा बरीच निराळी होती. त्यांनी कर्ममार्गाला बरेंच उचलून धरिलें आणि जन्मपात्र ब्राह्मणाला इतरांपेक्षा वरिष्ठ ठरविले. वारकरी संप्रदायात रामदासांना विशेष मान नसण्याचे आणि भिक्षुकवर्गाकडून त्यांस धन्यवाद मिळण्याचे कारण हेच असावें असे आम्हाला वाटते.
गेल्या शतकांत राजा राममोहनराय, ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्रसेन, महर्षि देवेंद्रनाथ टागोर, पंडित दयानंदसरस्वती, ज्योतीराव फुले, लोकहितवादी गोपाळराव देशमुख वगैरे थोर विभूतींनी ह्या बंडाच्या नाड्या बऱ्याच ठेचून टाकिल्या या महात्म्यांचाहि आमच्या भिक्षुकशाहीनें काही कमी छळ केला असे नाही. स्वामी दयानंद पुण्यास गेल्यावेळी ह्या बंडखोरांनी आणि त्यांच्या बहिष्कार शास्त्रास घाबरून त्यांच्या निशाणाचा आश्रय करणाऱ्या नामर्दानी त्यांचे कसेकसे धिंडवडे केले आणि आज त्यांचेच पुत्रपौत्र स्वामीजींच्या कट्टया शिष्याच्या कशा मिरवणुकी काढीत असतात, ह्या गोष्टी आज सर्वांस महषूर असल्यामुळे येथे त्यांचे विशेष विवेचन करीत नाहीं. ज्योतीराव फुले आणि लोकहितवादी देशमुख यांच्यावर हल्ले करून भिक्षुकशाहीची तळी उचलून धरण्याच्या कार्यात प्रतिभाशाली जोमदार लेखक कै.विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आपली अर्धी अधिक हयात खर्ची घातली.
आता काळ बदललेला आहे. पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार मोठ्या नेटानें जरी नाहीं तरी सर्वत्र होऊ लागला आहे. दळणवळणाची साधने वाढून लोक त्यांचा उपयोग जारीने करीत असल्यामुळे, आमची कूपमंडूक वृत्ति आता अस्तंगत होऊ लागली आहे. शास्त्रीय ज्ञानाच्या प्रगतीमुळे भोळसट कल्पनांना कायमच तिळांजळी मिळण्याचा समय नजीक येऊन ठेपला आहे. पुराणे, स्तोत्रें, महात्म्यें आणि व्रतकथा यांचा फोलकटपणा आतां जनतेच्या निदर्शनास येऊ लागला आहे. अशा वेळी लोकमान्य टिळकांसारख्या विद्वानाने जरी ‘ख्रिस्त्यांच्या हातचा चहा घेण्यात आणि पुनर्विवाहाच्या प्रसंगी पानसुपारीला जाण्यात पातक नाहीं’ असें ठरविण्याकरिता शंकराचार्यांच्या प्रतिनिधी समोर आरोपी म्हणून उभे राहून आणि आपल्या बचावाकरिता धर्मग्रंथांचे शेंकडों आधार त्यांच्यापुढे मांडून अथवा देशाला स्वराज्य मिळविण्याकरिता केलेल्या जलप्रवासाबद्दल प्रत्यक्ष प्रायश्चित घेऊन, पर्यायाने बंडखोर भिक्षुकशाहीचे महत्त्व कितीहि वाढविले असले, तरी यापुढे अज्ञानांध:काराबरोबरच भिक्षुकशाहीच्या बंडाचाहि नायनाट झाल्यावांचून खास रहाणार नाही.
रा. ठाकरे यांनी आपल्या प्रस्तुत पुस्तकाच्या १०० व्या पृष्ठावर के. टिळकांच्या प्रायश्चित्ताच्या बाबतीत निस्पृहपणाने टीका केल्याबद्दल महाराष्ट्र - साहित्यकाराच्या स्पष्टोक्तीची तारीफ केली आहे. प्रस्तावना लिहीण्याचे कबूल केल्यावर पुस्तक वाचीत असतां हा भाग आमच्या अवलोकनात आला. पूर्वी येता तर आम्हीं रा. ठाकऱ्यांच्या आग्रहालाहि बाजूस सारून हें प्रस्तावना लेखनाचे कार्य आंगावर खचित घेतलें नसतें. जलपर्यटनाबद्दल प्रायश्चित्त घेणारी व्यक्ति कोणीहि असे प्रायश्चिताचा पोंचटपणा लोकांच्या निदर्शनास आणून देणे हे लेकशिक्षणाचे ब्रीद बाळगणाऱ्या पत्रकाराचे कर्तव्य आहे असे आम्हाला वाटते. लोकमान्य टिळकांनी विलायतेस गेल्याबद्दल प्रायश्चित्त घेतले आणि तो प्रसंग साधून आम्ही प्रायश्चित्तासंबंधाचे आमचे विचार निर्भिडपणे लोकांसमोर मांडिले, जर तो लेख अशा सार्वजनिक महत्त्वाचा नसता, व केवळ व्यक्तिशः टिळकांवरच जर ती टीका असती, तर त्यांच्या निधनापूर्वीच ती छापून तयार असता. निरुपायानेंच का होईना, त्यांच्या निधनानंतर आम्ही ती खास प्रसिद्ध केली नसती. हा लेख अशा रीतीनें प्रसिद्ध झाल्यानंतर आतां कोणी वर्तमानपत्रांत आमच्यावर कुत्सित टीका करोत, खासगी पत्र पाठवून आम्हांला शिव्या देवोत किंवा महाराष्ट्र साहित्याला बहिष्कार घालोत अथवा रा. ठाकऱ्यांप्रमाणे आमचे अभिनंदन करोत्. कर्तव्यानंदापुढे आम्हाला ह्या निंदास्तुतीबद्दल दुःख अथवा सुख दोहोंचीहि विशेष पर्वा वाटत नाहीं. प्रायश्चित्त घेतल्याबद्दल लोकमान्यांवर आम्हींच टीका केली होती असे नाही, समाजकल्याणापुढे आणि स्वतःच्या कर्तव्यापुढे लोकमान्यांची मुरवत न बाळगणाऱ्या अनेक पत्रकर्त्यांनी आमच्या पूर्वी आणि आमच्यापेक्षांहि जास्त निस्पृहतेनें त्यांचा समाचार घेतला होता. रा. ठाकरे यांच्या अवलोकनांत जर नगरच्या दीनमित्राने केलेली टीका आली असती तर त्यांनी महाराष्ट्र - साहित्यकाराच्या निस्पृहतेबद्दल त्यांस इतके धन्यवाद दिलेच नसते ।
भिक्षुकशाहीच्या बंडाचा आतापर्यंत आम्ही वर जो इतिहास दिला आहे त्या केवळ ब्राह्मणेतरांविरुद्ध आहे असे म्हणता येणार नाहीं. ब्राह्मणेतरां इतके जरी नसले, तरी त्याचे दुष्परिणाम बऱ्याच ब्राह्मण म्हणविणाऱ्या जातींना व गृहस्थ ब्राह्मणांनाहि भोगावे लागले आहेत व लागत आहेत. तसेच ते मोडण्याच्या कामी ब्राह्मणेतरांस ह्या गृहस्थवर्गातील ब्राह्मणांनी अनेकवेळा मोठी महत्त्वाची मदत केलेली आहे आणि आजहि ते तशा प्रकारची मदत त्यांस करीत आहेत. फार कशाला इतिहास काली ह्या बडखोरांवर पहिला हल्ला चढविणारा ज्ञानेश्वर, जन्माने ब्राह्मणच होता; त्यानंतर तीनशे वर्षांनी या बंडखोरांस त्राहि भगवान म्हणावयास लावणारा एकनाथहि जन्मतः पैठणचा अस्सल ब्राह्मणच होता एकंदरीत विचार करिता भिक्षुकशाहीच्या समाजविध्वंसक बंडाविरुद्ध बोलणे किंवा लिहिणे म्हणजे हल्ली जिला ब्राह्मणेतरांची चळवळ म्हणून म्हणतात त्या चळवळींत सामील झाल्याचे अघोर (?) पातक करणें असें जर कोणी म्हणत असेल तर तो त्याचा मतलबी वेडेपणा आहे, असे आम्हांला वाटतें.
हल्लींच्या जन्मसिद्ध जातींची उभारणी वर्णाच्या पायावर झाली असें म्हणतात; पण गुणकर्मविभागतः उत्पन्न झालेल्या चार वर्णांचा आणि सध्यांच्या आमच्या चार लाख जातींचा कांहीं एक संबंध नाही, असा संबंध असता तर सर्वच धर्मातील समाजांत आमच्या हिंदु समाजाप्रमाणें जाति मानण्यांत आल्या असत्या. पुस्तकसंग्रहांत ज्याप्रमाणे ऐतिहासिक, शास्त्रीय, वाङमयविषयक इत्यादि विषयवारीने पुस्तकांचे वर्गीकरण करितात त्याप्रमाणें हिंदुसमाजांत मनुष्याच्या अंगच्या गुणांवरून आणि त्याने दाखविलेल्या कर्तबगारीवरून जे वर्गीकरण केलेलें आहे त्यालाच वर्णपद्धति असें आमच्या प्राचीनतमपूर्वजांनी म्हटलेले आहे. अर्थात ही वर्णपद्धति नावानें जरी नसली तरी सर्व धर्माच्या आणि सर्व देशांतील समाजांत अस्तित्वांत आहेच आणि यापुढेंहि ती तशीच अस्तित्वांत रहाणार याबद्दल आम्हांला तरी बिलकुल शंका वाटत नाही. हिंदुस्थानांतल्या भिक्षुकशाहीच्या पुरस्कर्त्यांनी मात्र आपले श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याकरिता तिला जातीचे स्वरूप दिलें आणि जाती जन्मावरून ठरविल्या! जन्मावरून मनुष्यांचें उच्च नीवत्व ठरवावयाचे. आपल्याच धर्मबंधूस, फारतर काय पण त्यांच्या सावलीस देखील अस्पृश्य मानावयाचे असले गाढवाचे गोंधळ अद्वैतवादी आद्य शंकराचार्यांच्या शिष्यत्वात धन्यता मिरविणाऱ्या आमच्या समाजांत केवळ ह्या भिक्षुकशाहीच्या बंडामुळेच उत्पन्न झाले आहेत. हे कृत्रिम भेद मोडून काढा, कोणालाहि अस्पृश्य मानू नका, कामना सिद्धीची लालूच दाखवून तीर्थ यात्रा, व्रतवैकल्यें, श्राद्धपक्ष इत्यादिकांच्या फेऱ्यांत भोळ्या समाजाला पाडू नका, वेद ईश्वरप्रणित असोत किंवा मनुष्यप्रणित असोत, इतर ग्रंथांप्रमाणे ईश्वराच्या सर्व लेकरांची अखिल मनुष्य जातीची, त्यांवर सारखीच सत्ता आहे. आपली जात तेवढी श्रेष्ठ आणि तिलाच वेदपठणाचा अधिकार असे म्हणणे म्हणजे शुद्ध दंडुकेशाही आहे, असेंच ब्राह्मणेतरांचे आणि सत्यशोधकांचे म्हणणे आहे. ज्या ब्राह्मणांना तें मान्य आहे ते भिक्षुकशाहींचे बंड मोडण्याच्या कामी आज देखील त्यांना मदत करीत आहेत. सत्यशोधक समाज निघाला त्याचवेळीं निदान आपल्या महाराष्ट्रांत तरी हा ब्राह्मण ब्राह्मणेतरांचा वाद अलीकडच्या काळांत चालू झाला. ह्या पूर्वी भिक्षुकशाहीनें ब्राह्मणेतरांना अनेक प्रकारें छळले. पण तो ऐतिहासिक भाग बाजूला सारला तरी प्रस्तुत वाद चालू होऊन आज पन्नास वर्षे झाली, असें असतां सरकारी अधिकाऱ्यांच्या चिथावणीनेच हे पक्ष झाले वगैरे कुत्सित कल्पना जनतेच्या मनात भरवून आपल्या वाटेस कोणीहि न जाईल असे करणें हा भिक्षुकशाहीचा कावा आहे. सध्याच्या काळी ह्या वादाचें मूळ काय आहे, ब्राह्मणेतर जें म्हणतात त्यांत कोठें चूक आहे, बंडखोर भिक्षुकशाहीच्या म्हणण्यांत कितपत सत्य आहे, हे पहाण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. ब्राह्मणेतरांप्रमाणेच ब्राह्मणांनीहि सत्यशोधक बनून आजच्या धार्मिक, सामाजिक, बौद्धिक वगैरे गुलामगिरींतून प्रथम आपल्या बांधवांची सुटका केली, तरच राजकीय गुलामगिरीतून सर्वांची सुटका होईल. रा. ठाकरे यांच्या पुस्तकांत ह्या गोष्टीचें यथोचित विवेचन असून त्यानी आपल्या विवेचनास आधार म्हणून टीपेंत दिलेले उतारे अत्यंत चिंतनीय आहेत.
ठाकरे यांनी पुस्तकारंभी हातांत धरलेली लेखणी पुस्तक अपुरेच पुरे करून खाली ठेविली असावी असें दिसतें. ही लेखनशैली कितीहि प्रतिभा द्योतक असली तरी वाचकांस कंटाळवाणी होते. ह्यापेक्षा त्यांनी जर ह्या पुस्तकाचे भाग पाडले असते, तर विषयप्रतिपादन कंटाळवाणें न होता, अधिक व्यवस्थित आणि पुनरुक्तीदोषरहीत असें झालें असतें. स्त्रियांचं अज्ञानच भिक्षुकशाहीच्या बंडाचें विशेष पोषक आहे असे सांगून त्याचें विवेचन स्वतंत्र पुस्तक रूपाने देण्याचे रा. ठाकरे यांनी योजिल्यामुळे त्यांचें हें प्रस्तुत पुस्तक अपूर्ण स्थितींत अर्थात मध्येच पूर्ण झाल्यामुळे वाचकांची निराशा झाल्यावांचून रहात नाही.
“ब्राह्मणेतरांची चळवळ` या लोकमान्य शब्द योजनेनें आतां सुप्रसिद्ध होत असलेल्या सुधारकांचा कटाक्ष ब्राह्मण म्हणविणाऱ्या समाजाविरुद्ध नसून या भिक्षुकी कारस्थानाविरुद्ध आहे.” (पृ. ४७) असें जें रा. ठाकरे यांचें म्हणणें आहे तें अगदी बरोबर आहे. आम्हीं वर एके ठिकाणी आपला अभिप्राय याप्रमाणेच नमुद केला आहे. रा. ठाकरे यांनी जरी ह्या भिक्षुकीकारस्थानाविरुद्धच लिहिण्याचे योजिलें असले आणि ‘ब्राह्मण म्हणविणाऱ्या समाजाविरुद्ध’ लिहिण्याचा जरी त्यांचा हेतु नसला तरी त्या कारस्थानाच्या परिपोषाचा विचार चालू असतांना आणि विशेषतः ह्या कारस्थानी मंडळीकडून वारंवार पुढे ढकलण्यात येणारें बीज क्षेत्राचें घोडें किती लंगडें आहे हें सांगताना सामान्यतः ब्राह्मण जातीवर तुटून पडल्यासारखे दिसतात. पण ब्राह्मणाच्या कुळांत जन्मल्याने जसा कोणी गुणकर्माने ब्राह्मण होऊ शकत नाहीं तसाच क्षत्रियांच्या कुळांत जन्मल्यानें कोणीहि खरा क्षत्रिय होऊ शकत नाही. ब्राह्मण जसे महारादि हीन मानलेल्या जातींना अस्पृश्य मानितात तसेच क्षत्रियादि इतर वर्णाचे लोकहि त्यांना अस्पृश्य मानितात ह्या गोष्टी लक्ष्यांत घेतल्या तर भिक्षुकशाहीच्या बंडाला ब्राह्मणांइतकेंच इतर समाजांकडून प्रोत्साहन मिळत आहे ही गोष्ट कोणालाहि अमान्य करिता येणार नाहीं.
रा. ठाकरे यांच्या प्रस्तुतच्या पुस्तकाच्या वाचनानें भिक्षुकशाहींचे कारस्थान कसे उभारलें गेलें आणि ह्या कारस्थानी लोकांनी धर्मग्रंथात स्वतःचं स्तोम माजविण्यासारख्या गोष्टी दडपून ब्राह्मणादि सर्वच वर्णाच्या गळ्यांत बौद्धिक गुलामगिरी कशी बांधली ह्या गोष्टी चांगल्याच समजतील.
रा. ठाकरे कोणत्याहि पक्षाचे नाहीत. ब्राह्मणांच्या पक्षाचे नाहीत की ब्राह्मणेतरांच्या पक्षाचे नाहीत. ते सत्यशोधक आहेत पण सत्यशोधक समाजाचे सभासद नाहीत किंवा त्या समाजाविरुद्ध दौरा काढणारेहि नाहींत. राजकीय बाबतीत त्यांचीं मतें कोणत्या पक्षाची आहेत हे जरी आम्हाला माहीत नाहीं, तरी सामाजिक आणि धार्मिक सुधारणेच्या बाबतीत ते जहालांतले जहाल असल्यामुळे राजकीय बाबतीत देखील फारसे मवाळ असतील असे वाटत नाही. अशा विचाराच्या आणि मताच्या विद्वानाकडून लिहिल्या गेलेल्या पुस्तकांत उपरिनिर्दिष्ट कांहीं दोष असले तरी ते सात्विक त्वेषाचे द्योतक आहेत. असें समजून वाचक वर्ग त्यांतील गुणांचेच ग्रहण करतील अशी आशा आहे.
गोविंद गोपाळ टिपणीस
मुंबई, हनुमान जयंति, शके १८४३
वज्रप्रहार ग्रंथमालेचा उद्देश
॥ सत्यात् नास्ति परोधर्मः ॥
मानवजातीच्या संसारात उदारमनस्कता, व्यापकता व पूर्ण स्वातंत्र्य आणणे, म्हणजेच पृथ्वीवर परमेश्वराचे साम्राज्य स्थापन करून नराला नारायण स्वरूपाचा साक्षात्कार पटविण्याइतकें पुण्यकर्म आहे. हे पुण्यकर्म निर्विघ्न पार पाडण्यासाठी जनतेत ज्ञानाचा प्रसार अधिकाधिक करण्याबद्दल द्विधामत असणे शक्य नाहीं. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ही जगद्गुरु श्रीकृष्ण भगवंताची आज्ञा आहे. हल्ली महाराष्ट्रांत मतामतांचा गलबला सर्वत्र घुमश्चक्री घालीत असता ‘कोणी पुसेना कोणाला’ अशी अनवस्था पदोपदी प्रत्येकाच्या प्रत्ययास येत आहे. अखिल भरतखण्डात पुरुषांच्या निवळ साक्षरतेचे (विद्वत्तेचे किंवा विचारक्षमतेचें मुळींच नव्हे) प्रमाण शेकडा फक्त सहा असून, स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण हजारी तरी एक पडेल की नाही, याची वानवाच आहे. अस्पृश्य व अवनत (डिप्रेस्ट) बांधव ७ कोटींच्याहि वर असून त्यांच्या निरक्षरतेचे प्रमाण शेंकड़ा ९९.५ आहे. उच्चत्वाची शेखी मिरवणाऱ्या समाजांकडून या मुक्या दुबळया समाजावर होणाऱ्या जुलमापुढें व अन्यायांपुढे नादीरशहा तैमुरलंगाच्या तलवारीसुद्धा बोथट पडतील, इतकें त्या जुलमाचे स्वरूप क्रूर, अमानुष व माणुसकीच्या तोंडाला काळे फासणारे आहे. २०,७१,४७,०२६ हिन्दुजनांच्या समुदायांत दोन कोटी साठ लक्ष निरक्षर विधवा असून त्यांच्या आपत्तीचे स्वरूप अवनत बांधवांच्या दुर्दैवापेक्षां खचित कमी निंद्य व चिळस आणणारे नाही. येणेप्रमाणे आमच्या बुद्धिमत्तेची व नीतिमत्तेची वाट लागली, शारिरीक सुस्थितीबद्दल तर लिहिण्याची सोयच नाही. वैवाहिक संस्कारांतल्या बालविवाहाच्या अमानुष जुलमांमुळे शेकडा २५ अबला अकाली मृत्युमुखी पडत आहेत व विवाहविधी व्यापारी धोरणावर किंवा ‘पुरवठा व मागणी’ च्या तत्वावर चालू असल्यामुळे शेंकडा २५ ते ३५ स्त्रिया प्राणघातक शारिरीक व्यंगामुळे जिवंत असून नसून सारख्याच होत आहेत. लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण हजारी २११ असून, शेंकडा पंचवीस मुलें एका वर्षाच्या आतच आपल्या पणजोबाच्या भेटीची तांतड करतात. संपन्नतेच्या बाजूला पाहिलें तर या २० व्या शतकांत अन्नपाण्यावांचून तडफडून प्राण सोडणाऱ्या हिन्दी बांधवांची संख्या सात कोटीच्या वर आहे. व्यापारधंद्याच्या नांवानें केवढा मोठा शंख दुर्देवाच्या अडणीवर बसला आहे. तो बोट न दाखवितां कोणालाहि दिसणारा आहे. अशा अनेक राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक जखमांत आणखी जातिमत्सरांच्या प्राणघातक किड्यांचा भयंकर बुजबुजाट झाल्यामुळे हिन्दु विराटपुरुषाचे हिडीस चित्र रंगविण्याच्या कामी विश्वकर्म्याच्याहि चित्रकौशल्याला हात टेकण्याचा प्रसंग सांप्रत आला आहे. अशा या मरू घातलेल्या विराटपुरुषाच्या सडलेल्या कोठ्यात लोकशाहीचे रसायन कोणी कितीहि शहाणा धन्वंतरी असला तरी चुटकीसरसें मुळींच पचनीं पाडूं शकणार नाहीं, असें आम्ही कोणाच्याहि निंदास्तुतीची पर्वा न करतां स्पष्ट म्हणतो. लोकशाहीची पुराणें झोडायला व ऐकायला जरी कांहीं श्रम पडत नाहींत व त्यांच्या गोंडसपणानें जनता जरी घटकाभर आनंदाने बेहोष होऊन नाचू लागेल, तथापि लोकशाही हे मृगजल आहे. व ते हिंदूंची तहान सध्या तरी मुळींच भागवू शकणार नाहीं, असें आमचें प्रामाणिक मत आहे. गुलामगिरीत खितपत पडणाऱ्या लोकांना स्वातंत्र्याचीं पुराणें आकर्षक व मधुर वाटणे, यात अशक्य असे काहींच नाहीं तो निसर्गाचा नियमच आहे. परंतु गुलामगिरींतून निसटून स्वातंत्र्याच्या क्षेत्रांत येण्यापूर्वी आपल्याच दुष्कर्मामुळे आपल्या हातापायांत पडलेल्या अनेक पोलादी श्रृंखला दांतांनी कुरतडून तोडण्याचे महायत्न करावे लागतात, हे विसरता कामा नये. गुलामगिरीचे स्वातंत्र्यात होणारे दिव्य पर्यवसान म्हणजे आधुनिक नाटकांतला ट्रान्स्फर सीन नव्हे. लोकशाहीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी अनेक स्वदेशी शाह्यांच्या दौती लाथाडून जमीनदोस्त कराव्या लागतील व केल्या पाहिजेत. पाश्चिमात्य असुरी मायेचा (जिला महर्षि रविंद्रनाथ टागोर नॅशनॅलिझम असें सार्थ नांव देतात, तिचा) प्रतिकार करण्यापूर्वी, खुद्द आमच्याच देशांतल्या देशांत ज्या अनेक असुरी शाह्यांच्या जुलमी लीलांचे धांगडधिंगे आज अनेक शतकें चालू आहेत, त्यांना चेंचून जमीन दोस्त केल्याशिवाय हिंदुस्थानाला व विशेषतः हिंदुजनांना सुखाची व शान्तीची प्राप्ती खास होणार नाही, असे आम्ही कोणाचीहि भीत न धरता स्पष्ट म्हणतों.
गेली वीस वर्षे स्वाध्याय, मनन व निरीक्षण करीत असतांना आमच्या मनावर जे जे संस्कार झाले, बुद्धीला जीं जीं तत्त्वें विचारांती पटली व प्रवासांत ठिकठिकाणच्या विद्वानांशी चर्चा करून आमच्या हिंदु समाजांतल्या सामाजिक, धार्मिक व नैतिक अनेक अन्यायांची आम्हांला जी प्रत्यक्ष प्रचिति आली, त्या सर्वांचें निःपक्षपणानें, स्पष्टोक्तीनें यथाशक्ति उद्घाटन करण्याचा आम्हीं निश्चय करून, नवमतवादाचा पुरस्कार करणारी ही
वज्रप्रहार ग्रंथमाला
गुंफण्याचे कार्य हाती घेतले आहे ‘सत्यात् नास्ति परोधर्म सत्यापरता नाहीं धर्म । सत्य हेंचि परब्रह्म |’ हें आमचं ब्रीदवाक्य आहे. आम्हांला राजमान्यतेची चाड नाहीं, लोकमान्यतेची पर्वा नाही. स्वकीय परकीयांच्या निंदास्तुतीची अगर वर्तमानपत्री चित्रगुप्तांच्या शिखंडी हल्ल्यांची दिक्कत नाहीं. उच्चनीचत्वाचा भेद आम्ही साफ झुगारून देऊन, सर्व देशबांधव एकाच दर्जाचे आहेत, या भावनेने आम्ही कोणाच्याहि रागलोभाची पर्वा न करता सत्य गोष्टी स्पष्ट बोलून दाखवू कोणी कितीहि प्रतिकार केला तरी यांत खंड पडणार नाहीं. आमची लेखणी व जिव्हा थांबविण्याची शक्ति एक मृत्यूमध्यें आहे. इतर कोणच्याहि मानवी शक्तीचें तें सामर्थ्य नव्हे ! मानापमानाचा पूर्ण संन्यास करून आमच्या देशबांधवांत सत्य तत्वांची जागृति उत्पन्न करण्यासाठी आम्ही अन्यायांवर वज्रप्रहार करण्याचा भगवान् श्रीकृष्णाच्या प्रेरणेनें दृढ संकल्प केला आहे. जेथें जेथें अन्याय होत आहे किंवा असेल, खोडसाळ असुरी कल्पनांच्या मायेची जाळी पसरली गेली आहेत जात आहेत व पुढे जातील, त्या त्या ठिकाणी आमचा वज्रप्रहार दत्त म्हणून उभा आहेच असें समजा. ज्यांना आमच्या मतांशी सामना द्यावयाचा असेल, त्यांनी प्रामाणिकपणाने व विशेषतः सभ्यपणानें टीकास्त्रांनी खुशाल विरोध करावा; आम्ही त्या सज्जनांच्या विधानांना अत्यंत प्रामाणिकपणानें सरळ सरळ प्रत्युत्तरे आमच्याच पुस्तकांतून देऊ वर्तमानपत्रांचा कधीहि अवलंब करणार नाहीं श्रीमत्स, विपर्यासी, पौरसवदा किंवा संदेशी धाटणीच्या टीकाकारांना आम्ही कदापिहि प्रत्युत्तर देणार नाही. शिखंडीवर शरसंधान रोखणें हें क्षत्रियांचे ब्रीद नव्हे !
ध्येय जरी एकच असले तरी कार्य करण्याच्या पद्धति प्रत्येकाच्या भिन्नभिन्न असतात. रोगाच्या निदानाच्या बाबतींत वैद्य डॉक्टरांचे जरी एकमत झालें तरी प्रत्येकजण आपापल्या मताप्रमाणेच औषधयोजना करणार डॉक्टर टिंक्चराकडे धांवणार, वैद्य काढया निकाट्याच्या सप्तकाची योजना करणार, होमिओपाथ मोहरीएवढी एकच गोळी बालदीभर पाण्यांत विरघळवून एकेक मिनिटाला चमचाचमचा आचमनाची शेग्याला संथा देणार आणि सर्जन म्हणणार ‘हें कांहीं नको, या रोगावर शस्त्रप्रयोगच केला पाहिजे.’ असा मतमतांतराचा धांगडधिंगा नेहमीच चालत असतो. अर्थात् आमच्या पुस्तकांतली विवेचनसरणी जरा विशेष स्पष्ट व विखट का असते. याला आमचें उत्तर हेंच की आमच्या मताप्रमाणे हीच पद्धति आतां आवश्यक आहे. हिन्दुसमाजांतील ज्या अनेक दोषांवर आम्ही कडकडीत टीका केली आहे, त्यापेक्षा अधिक खरमरीत भाषेत त्यांचे वाभाडे काढणारे आमच्यापेक्षा सवाई शिकंदर ग्रंथकार अनेक झाले आहेत व होतील. अमूक एक दोष हा भयंकर आहे. इतके खात्रीलायक पटल्यावर त्याला आमूलाग्र उखडून टाकण्यासाठी शस्त्रप्रयोगाची मनाची निष्ठुरता न दाखवितां, त्यावर नुसत्या घोटीव मलमाच्या मलमपपट्ट्या बांधीत बसणें म्हणजे मनाचा दुबळेपणा व्यक्त करणें होय.
भिक्षुकशाहीच्या डाग या असल्या तोंडपुज्या मलमपट्ट्यांनी आता अगदी पूर्ण पिकलें आहे. पिकवणीचे काम झाले. आता त्यावर तीक्ष्ण शस्त्राचा टोला मारून त्याला तोंड पाडले पाहिजे, म्हणजे आपोआप त्याची सर्व घाण बाहेर पडूं लागेल. राष्ट्रांतील सर्व गोष्टीची पुनर्घटना होऊ घातली असतां, अमूक एक प्रश्न सध्या बाजूला ठेवा असें म्हणणें केव्हांहि न्याय्य होणार नाही. पुनर्घटना करायची तर ती सर्वांगीण तरी करा. नुसत्या राजकीय पुनर्घटनेच्या प्रश्नानें हिन्दुस्थानांतले सर्व वादग्रस्त प्रश्न मिटतील, असे आम्हांला मुळीच वाटत नाही. राजकीय बाबतीत ब्राह्मणेतरांचा ब्राह्मणांवरील विश्वास अज्जीबात उडालेला आहे आणि सामाजिक व धार्मिक बाबतीतल्या ब्राह्मणांच्या वर्तनाचा गतेतिहास अत्यंत जुलमी, बेदरकार व उर्मट असल्याची साक्ष स्पष्ट व ठळक आहे. अशा स्थितीत धार्मिक व सामाजिक क्षेत्रातली उच्चनीचत्वार्थी लहान मोठी टेकाडी जमीनदोस्त करून हिन्दुसमाजातील सर्वच क्षेत्रांची भूमिका ताळेबंद समप्रमाणांत आणल्याशिवाय नुसत्या कोरड्या राष्ट्रीयत्वाच्या पुराणांना अतः पर कोणी भाळणार नाही. इंग्रजी नोकरशाहीच्या कृष्णकृत्यांची जितकी चीड ब्राह्मणांना येत आहे. तितकी ब्राह्मणेतरांना येत नाही, असे म्हणणे म्हणजे वस्तुस्थितीचा जाणूनबुजून शुद्ध विपर्यास करण्यासारखे आहे. गुलामगिरीच्या जोखडाखाली उत्साहाने मान देणारा अधम प्राणी या विसाव्या शतकांत हिन्दुस्थानांत औषधालासुद्धा मिळणार नाही. ब्राह्मणेतरांच्या चळवळींच्या मुळांशी गुलामगिरीची चीडच मुख्यतः आहे. हे लक्षांत असावें. गुलामगिरी-मग ती उन्मत इंग्रजी नोकरशाहीची असो, नाहींतर मदोन्मत्त भिक्षुकशाहीची असो, ती एकदां कायमची झुगारून द्यायची व राजकीय, धार्मिक, सामाजिक सर्वच बाबतींत पूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचें, हाच मुख्य उदेश ब्राह्मणेतरांच्या चळवळींचा दिसतो.
आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर ब्राह्मणांनी आपल्या हाती असलेल्या सत्तेचा अत्यंत दुरुपयोग केलेला आहे, असे मोठ्या कष्टानें म्हणणे भाग पडलें. इतकेंच नव्हे तर उदार मनानें पूर्वीचे दोष उघड कबूल करून त्यांचे योग्य परिमार्जन करण्याऐवजी त्या दोषांची तरफदारीच करण्याकडे कांहीं मूठभर व्यक्त्या बाद करून ब्राह्मणवर्गाची प्रवृत्ति अजून सुद्धा इतकी तीव्र आहे की ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वादाचा समेट नुसत्या शाब्दिक वादविवादानें घडून येईल किंवा नाही, याची जबरदस्त शंका येते. खरें म्हटलें तर वादविवादाचे युग संपून या तंट्याचे पाऊल प्रत्यक्ष प्रतिकाराच्या क्षेत्रांत पडून सुद्धां चुकलें आहे. हल्ली ठिकठिकाणी ब्राह्मणेतरांच्या ज्या चळवळी सुरू झाल्या आहेत, त्याचा मुख्य हेतू. जर कोणता असेल तर तो तीनच शब्दात सांगता येतो. Down with Priests ( भिक्षुकशाहीला खाली ओढा या चळवळीची साधने (methods) किंवा त्याचे वर्तन (conduct) अगदी सोळा आणि सात्विक नसतील आणि एकदा युद्धालाच तोंड लागले की कवायतीच्या शिस्तीची समरभूमीवर फारशी कोणी पर्वा राखीत नाहीं तरी पण त्यांच मूळ उद्देश जो भिक्षुकशाहीच्या गुलामगिरीचा नायनाट त्याबद्दल त्यांना कोणीहि समंजस मनुष्य जबाबदार धरणार नाही. आमच्या मतें ही चळवळ भिक्षुकशाहीच्या उन्मत्त वर्तनाची काटेकोर प्रतिक्रिया आहे. आघाताचा प्रत्याघात आहे. कृतकर्मांचे प्रायश्चित आहे. कसाहि आणि कितीहि विचार केला तरी या चळवळी बंद पाडण्याचे कार्य विरोधानें घडणे शक्य नाहीं. विरोधानें विरोधच वाढणार ! भिक्षुकशाहीच्या कृत्रिम वर्चस्वाविरुद्ध उघड उघड चढाई करणाऱ्या या व्यक्त चळवळीपेक्षां ठिकठिकाणी असल्या अनेक अव्यक्त चळवळीं आहेतच. त्यांची वाट काय? या का अस्तित्वांत आल्या? त्यांचे ध्येय काय? त्यांचा परामर्ष सामोपचारांनी घ्यायचा की वितंडवादांनी कलहाग्नि भडकावून द्यायचा ? याचा विचार प्रथम व्हावयास पाहिजे. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या उदात्त कल्पनांच्या वातावरणात उंच उंच भराऱ्या मारणाऱ्या गरुडांनी पृथ्वीतलावरील आपल्याच घरची आपलीच भावंडे समर्थांच्या घरच्या श्वानानी किंवा श्वानांच्या घरच्या समर्थांनी गुलामगिरीच्या वरवंट्याखाली ठेवण्याचा संप्रदाय चालू ठेवलेला पाहून सुद्धा किंचित् खाली उतरूं नये, यावरून कोणाला काय बोध घेता येण्यासारखा असेल तो घ्यावा! नरसोबाच्या वाडीला तेथील भिक्षुकांनी मुंबईकर दैवज्ञांवर केलेली प्राणघातक दंगल, नगरच्या नागझरी कुंडावरची मारामारी, बोरखळास झालेला तिरस्करणीय पोरखेळ, सज्जनगडावरचा हलकट दंगा, औंध संस्थानांत सध्यां सुरू असलेली पंतांची डायरशाही व या सर्व प्रकरणांचे खापर एनकेन प्रकारेण ब्राह्मणेतरांच्या माथी फोडण्याची राष्ट्रीय कंपूची चतुराई व कारवाई पाहून वारा कसा व कोणत्या दिशेला वहात आहे, हें सांगायला नको. हे असले प्रकार आजला ठिकठिकाणी घडत आहेत. ते पाहून कोणाहि समतौल भावनेच्या मनुष्याचे मन खिन्न झाल्याशिवाय रहाणार नाहीं. मग भिक्षुकशाहीच्या नकली वर्चस्वाविरुद्ध आधीच खवळलेल्या आडदांड सत्यशोधकांनी काही दंडेली केलीय. तर त्यांचा कान कसा पकडता येईल? अत्याचार केव्हांहि झाला, कोणीहि केला तरी तो निंद्यच, परंतु आपला दाम खोटा असून परक्यांशी झगडा करणे मूर्खपणाचे आहे. एवढी जाणीव जर भिक्षुकशाहीला होईल, तर या वादाचा शेवट हां हां म्हणता होईल. यांत मुळींच संशय नाही.
आमच्या आजपर्यंतच्या सर्व ग्रंथांना महाराष्ट्रीय बंधु भगिनीनी फारच चांगला आश्रय दिलेला आहे, इतका की आमच्या प्रत्येक ग्रंथाची प्रथमावृत्ति बोलबोलता महिना पंधरा दिवसातच खलास होत आली. या आश्रयाबद्दल आमचा विनम्र माथा त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक सदैव ठेविला आहेच. प्रस्तुत वज्रप्रहार ग्रंथमालेला असाच आश्रय देऊन आमच्या सत्यप्रेमी बंधु भगिनी आमच्या स्वतंत्र प्रवृत्तीच्या नवमतवादी निस्पृह वाङमयसेवेचे योग्य चीज करतील अशी फार फार उमेद आहे.
सर्व पत्रव्यवहार खालील पत्त्यावर करावा. याचे कारण आतांपासून आमच्या सर्व ग्रंथांचे प्रकाशन करण्याचे कार्य आम्ही आपल्या स्वतःच्याच हाती घेतले आहे. प्रकाशकांच्या बाबतीत आम्हाला अत्यंत कटु अनुभव आला आहे. प्रकाशकपणाचा शेंदूर फासलेले दगडधोंडे अखेर आपल्या जन्मप्रवृत्तीवर गेले. अर्थात् हाती घेतलेल्या कार्याच्या महत्त्वापुढे या दगडोबांना लाथाडून आमचा मार्ग आम्हांला खुला करून घ्यावा लागला. एक खप्पी प्रकाशक तर आम्हांला असे भेटले आहेत की सतत दहा वर्षे हाडांची काडे करून लिहिलेला आमचा एक ग्रंथ ते जे दडवून बसले आहेत तो परत करण्याची बुद्धीच त्यांना होत नाहीं. कारण काय? तर म्हणें `तो कोठे ठेविला आहे तो सांपडत नाहीं ! आतां या दीर्घ स्मरण्या गृहस्थांना लोकमान्य टिळकांची शपथ घालायचें मात्र राहिलें आहे; बाकी ग्रंथावर पाणी सोडण्यापलीकडे दुसरें गत्यंतर उरलें नाहीच. असो. या उप्पर आमच्या सर्व जुन्या नव्या ग्रंथाबद्दल पत्रव्यवहार करणे तो फक्त आमच्याच नावानें करीत जावा, पूर्वीच्या नामधारी प्रकाशकांचा व आमचा कांही एक संबंध उरलेला नाही किंवा त्यांच्या हाती आमच्या ग्रंथाबद्दल कसलेहि अधिकार (पूर्वी दिलेच नव्हते!) उरलेले नाहींत.
प्रस्तुत पुस्तकाच्या संकल्पावस्थेपासून तो त्याचा आज जन्म होईपर्यंत आमच्या अनेक मित्रांनी आम्हांला परोपरी सहाय केले. त्यांच्या सहायाच्या तुलनेने आमचे नुसतें शाब्दिक आभार प्रदर्शन अगदीच कमतोल ठरणार हे उघड आहे. आभार प्रदर्शनाचें काम मोठें बिकट असतें. ज्यांच्या सक्रीय सहानुभूतिमुळेच एखादें कार्य तडीला नेण्यास आपण शक्त होतो. त्या सहानुभूतीचा प्रत्युपकार फेडण्याचे सामर्थ्य नुसत्या शब्दांत तरी खास नाही. हे उपकार करणारा व प्रत्युपकाराचा प्रयत्न करणारा दोघेहि जाणत असतात. म्हणून आमच्या सर्व प्रेमळ सहायकांच्या चरणी आम्ही कृतज्ञ भावनाने मस्तक ठेवितो, या पलीकडे हृदयस्थान भावनेचे व्यक्तीकरण करण्यास अन्य मार्ग या क्षणी तरी आम्हांला आढळत नाही.
प्रेमळ मित्रांनी उत्तेजन दिलें, परोपरी सहाय केले व ग्रंथकाराने आपल्या बऱ्यावाईट पद्धतीनें ग्रंथ लिहून काढला; पण तो छापून निघाल्याशिवाय उपयोग काय? हल्ली मुंबईत छापखान्यांवर महागाईची व कामगारांच्या तुपाची दृष्टी भयंकर असतांनाह तत्त्वविवेचक छापखान्याचे तरुण उत्साही व सत्यप्रेमी मालक श्री. यशवंतराव काशिनाथ पडवळ य व्यवस्थापक श्री. तुकारामजी शेट यांनी हा ग्रंथ फारच मेहनतीनें उत्कृष्टपणे छापून दिला, याबद्दल त्यांचे उपकार कोणत्या शब्दांनी व्यक्त करावे? आम्ही त्यांचे फार आभारी आहोत.
देशबंधुभगिनींचा दासानुदास,
केशव सीताराम ठाकरे.
ता. ९ मे सन १९२१, सोमवार, श्रीशिवजयंति वैशाख शु.२ शके १८४३.
वज्रप्रहार ग्रंथमाला कचेरी, २०, मिरांडाची चाळ, दादर, मुंबई नं. १४.
प्रकरण १
भट्ट सांगे मठ्ठ ऐके!
॥ ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि ॥ धियो यो नः प्रचोदयात् ।
`आम्हां हिन्दु लोकांना अनेक शतकांपासून अनेक प्रकारच्या जुलमांखाली रहावयाची संवय झाल्यामुळे आमच्या समाजातील नीतिबल अगदी नाहीसे झाले आहे. राजकीय जुलूम, आचार्यांचा जुलूम आणि सामाजिक किंवा जातीचा जुलूम आशा तीन प्रकारच्या जुलुमांखाली आम्ही इतके दडपून गेलो आहों की. आम्हास मान वरच करता येत नाही.`
- डॉ. भांडारकर.
जुनें तेवढे सोनें, ही म्हण सोन्याइतकीच जरी मोहक आणि उत्कृष्ट असली, तरी सृष्टीक्रमाच्या निसर्गसिद्ध कायद्यांशी विरोध करणारी आहे. अर्थात् या म्हणीच्या सांवलीखाली फक्त जणिर्मतवाद्यांनी म्हणजे अप्रगमनशीलांनींच काय तो आश्रय घ्यावा, मानवी सृष्टीत हरहमेश मोठमोठाल्या चळवळी, प्राणघातक तंटे, मस्तकें भणाणून सोडणारे घातपात, हृदयाचे पाणी पाणी करून टाकणारी बंडे सत्याला असत्याचा आणि असत्याला सत्याचा मुलामा चढवून जीवसृष्टीचा संहार करणारी अमानुष युद्धे व कत्तली यांचा धुमाकूळ अखंड चालू असूनसुद्धा निसर्गदेवतेचा कारभार अगदीं कांटेतोल समतेनें अव्याहत चालूच आहे. इतकेंच नव्हे, तर
झपझप चालण्यास नेहमींच नाखुष
असलेल्या मानवी प्रवृत्तीलाही तो आपल्या बरोबर पुढे पुढे खेचीत नेण्यास सोडीत नाहीं. निसर्ग प्रवृत्ति कधीही एका ठिकाणी थांबून स्तब्द उभी राहत नाही, किंवा कोणी तिची मान कापली तरी पुढे टाकलेले पाऊल ती मागे घेत नाहीं. तिची धांव नेहमीं पुढे पुढेच असते. मानवी प्रवृत्ति नाठाळ बैलाप्रमाणे मध्येच कोठे तरी उठवणीस आल्याचे ढोंग करून पुढे पाऊल टाकण्याचें साफ नाकारते. यामुळे या दोन प्रवृत्तींच्या प्रगमनशीलतेत नेहमीच शेंकडों मैलांचे अंतर पडलेलें दिसून येते. निसर्गप्रवृत्तीचा ज्या ठिकाणी किंवा ज्या प्रदेशांत आज संचार चालू असतो, तें ठिकाण किंवा तो प्रदेश उद्या तिच्या सभोवार दृष्टीस पडत नाहीं. मानवी प्रवृत्ति निसर्गाच्या हिसकाहिसकीमुळे आणि कालोघाच्या सोसाट्यामुळे विसाव्या शतकाच्या मैदानांत येऊन जरी दाखल झाली, तरी तिला १४ व्या किंवा १५ व्या शतकांतल्या कल्पनाच्या शिळ्यापाक्या झुणका भाकरीचा मोह सुटत नाहीं.
निसर्गप्रवृत्ति आगगाडीसारखी आहे
क्रिस्ती शकाच्या पूर्वी ज्या ज्या परिस्थितीच्या स्टेशनांवरून ती भरधाव जात होती. ती स्टेशनें आज कालपटलामागे अदृश्य झाली असून, त्यांच्या अंधुकपणाबरोबरच तत्कालीन परिस्थितीचे निरनिराळे रंगसुद्धा आजला दृष्टीगम्य नसल्यामुळे, तीक्ष्णतम दृष्टीसामर्थ्याची घमेंड मारणाऱ्या मानवी प्रेक्षकांच्या नेत्रांना त्याच्या इतिहाससिद्ध सगुणत्वाला निर्गुणत्वाच्या कोटीक्रमाचा बाप्तिस्मा देऊन, आपल्या निरीक्षण कौशल्याची अब्रू कशीतरी बचवावी लागतें. कमीत कमी गेल्या चार सहा हजार वर्षांच्या अवधीत या आगगाडीने इतक्या दूरवर झपाट्याने प्रवास केलेला आहे की मानवी सृष्टीची प्रगमनप्रियता तिच्या प्रगतीच्या तडफेपुढे कःपदार्थ बनली आहे. निसर्गाच्या मेलगाडीने जे स्टेशन एकादा मागे टांकले, त्याकडे ती पुनश्च कधीहि परत वळत नाही. उलटपक्षी, मानवी प्रवृत्तीची मालगाडी परंपरेच्या कोत्या अभिमानाच्या ठोकरीमुळे वारंवार कोठल्या तरी मधल्याच स्टेशनावर ‘शंट’ करून ठेवावी लागते. निसर्गाच्या मेलगाडीच्या इंजिनात
नवविचारांचा धगधगीत अग्नि
भडकलेला असतो. मानवी प्रवृत्तीच्या मालगाडीच्या इंजिनाला सदर्न मराठ्याप्रमाणे लांकडांच्या ढलप्यांवर व जीर्ण सालप्यापांचोळ्यावर आपली भूक भागविण्याची संवय लागलेली असल्यामुळे, हरदाशी कंठाळी घोड्याप्रमाणे तिची गति असते. निसर्ग प्रवृत्ति ही जात्याच एखाद्या सार्वभौम राजाच्या पट्टराणीसारखी नखरेल आणि तालेवार आहे. एकदा नेसलेली पैठणी ती पुन्हां कधीहि नेसत नाहीं. एकदा वापरलेल्या चंद्रहाराला ती पुनश्च केव्हांहि आपल्या वक्षस्थळाचा स्पर्श होऊ देत नाही. एकदां चाखलेलें पक्वान्न तिच्या अधरोष्टाच्या स्पर्शाला केव्हांहि पुन्हा पात्र होत नाहीं. फार काय, पण श्रृंगारलीला केलेल्या आजच्या रंगमहालांत घडीभराने ती पाऊलसुद्धा टाकणार नाहीं. तिच्याइतकी नव्यानवाईची भोक्ती साऱ्या विश्वांत तिची तीच. तिला दररोज नव्यानव्या पैठण्या पाहिजेत, नव्यानव्या फॅशनचे नवीन नवीन रत्नांनी गुंफलेले रत्नहार पाहिजेत, नवीं नवीं रुचकर पक्वान्ने पाहिजेत आणि रोजच्या रोज नवनवे शृंगारलेले महाल पाहिजेत. जुन्यांकडे ती ढुंकूनसुद्धां पहात नाहीं किंवा त्यांची तिला आठवणसुद्धां होत नाही. रुचिवैचित्र्यांत निसर्गप्रवृत्ती जरी इतकी तालेवार आहे, तरी तिचा स्वभाव मात्र फार धिम्मा आणि तिचें वर्तन कांटेतोल पद्धतशीर आहे. मानवी कौशल्याने बनविलेली घड्याळे आणि तालयंत्रे वेळी पुढे मागे होतील नव्हे, होतातच, पण निसर्गप्रवृत्तीची गति ठराविक ताळमेळानेंच अखंड चालू आहे. वेदपूर्व काळ वैदिक काळ, तत्त्वज्ञानाची उच्च भरारी मारणारा उपनिषत्काळ पौराणिकी कादंबऱ्यांचा काळ व ऐतिहासिक काळ, अशा अनेक निरनिराळ्या क्षेत्रांतून तिनें पद्धतशीर संचार केला आणि आजला ती विचारशक्तिसंपन्न
नव्या मन्वंतराच्या विसाव्या शतकांत
नवजीवनाच्या रुचिवैचित्र्यांनी खमंग बनलेली नवविचारांची पक्वान्ने सेवन करीत झपाट्याने पुढे चाललीच आहे. वैदिक काळांत आल्यावर वेदपूर्व काळांतील आचारविचारांकडे तिनें ढुंकून पाहिलें नाहीं; उपनिषत्काळातील क्षत्रियांच्या छातिठोक तत्वशोधनांची प्रदर्शन पाहून, ऋग्वेद काळातील साध्या भोळ्या पारमार्थिक कल्पनांची तिनें टर उडविली नाही. किंवा पौराणिकी काळातील काल्पनिक कथोपकथांचा बेगडी बुट्ट्याचा शालू पांघरताना, उपनिषत्काळच्या शुभ्र तलम मलमली वस्त्रांची तिला आठवण झाली नाही ऐतिहासिक काळांत गोवळकोंडी कोहीनुरांची कंकणे मोठ्या अभिमानाने आपल्या हातांत चढलेली पाहूनसुद्धा, मागील पौराणिक काळांतील तकलादी दागदागिन्यांची तिने कधि निंदा केली नाही, किंवा ऐतिहासिक काळातील ठुशांचा घाट प्रचलीत नव मन्वंतरांत अजिबात का बदलला ? म्हणून तिनें कधिं कोणास प्रश्नहि विचारला नाही. कारण तिला पक्के माहीत आहे की Old order changeth giving place to new. "जुनी पद्धति बदलुनि जाते नदीस जागा द्याया.”
आता मानवी प्रवृत्ति पहा. ही स्वतःस फार शहाणी समजते. हिला आपल्या दूरदृष्टीची घमेंड फार. भूत वर्तमान व भविष्य या तीनहि काळांच्या नाकांत माझ्या एकमार्गी धोरणाची वेसण घालून मी त्यांना वाटेल तशी नाचवीन किंवा वाटेल तिकडे वळवीन, असा तिला मोठा आत्मविश्वास वाटतो. भूतकाळाचा आत्मा वर्तमान काळाच्या देहात घालून त्याला भविष्यपुराणे सांगण्यास भाग पाडण्याची शक्ति माझ्यामध्ये आहे, असे तिला निश्चयपूर्वक वाटते. मानवी प्रवृत्ति प्रगमनशीलतेचा मोठा आव आणते खरी, परंतु जन्मदारभ्य तिच्या गळ्यात अडकलेलें
परंपरा-प्रियतेचें लोडणें
आज गेल्या पाच सहा हजार वर्षांत तिला काढून टांकता आलें नाहीं. ही एकच गोष्ट तिच्या पंगूपणाची साक्ष देण्यास पुरेशी आहे. परंपरा होय परंपराच !! या परंपरेच्या केत्या अभिमानानें मानवी प्रवृत्तीची जगाच्या इतिहासांत जिसकी बदनामी झाली आहे. तितकी तिच्या इतर कोणत्याही दुष्कृत्यांनी झालेली नाही. काळाच्या धावत्या गतीबरोबर आणि निसर्गप्रवृत्तीच्या अप्रतिहत फोफावत जाणाऱ्या सिद्धांतांबरोबर आपल्या आचारविचारांची गति ठेवण्याची दूरदृष्टी - नव्हे, लायकीच मानवी प्रवृत्तीत नसल्यामुळे, तिचा इतिहास नेहमींच कालव्यतित्यानें चिघळत असतो. मानवी प्रवृत्तीची ही कालव्यतितता किंवा पुराणप्रियता मुख्य हिंदुस्थानांत व विशेषतः हिंदूत जशी ठळकपणे पहावयास मिळते, तशी जगांत इतरत्र कोठेंहि मिळणार नाही. या एका पुराणप्रियतेमुळे हिंदुस्थानाचें आणि हिंदूचें जितकें नुकसान झालेले आहे. तितकें परचक्रांनी केलेले नाही. आजला हिंदू लोकांची जी काही विशिष्ट नष्टाचर्य्यावस्था आहे, तिच्या मुळांशी याच एका दोषाचें बीज पडलेले आहे; आणि जोपर्यंत या बीजाचा बीमोड होणार नाहीं, तो पर्यंत हिंदूचा जगाच्या चढाओढीत टिकावही लागणार नाहीं परंपरेचा अभिमान निराळा आणि पुराणप्रियतेचा ताठा निराळा. पहिल्यांत जेवढी सात्विक शुद्धता हाती लागते. त्याच्या दसपट तामसी घाण दुसऱ्यात आढळते. पुराणप्रियतेत परंपरेच्या अभिमानाचें मीठ पडलेलें असतें, ही गोष्ट खरी, परंतु पुराणप्रियतेच्या तामसी तत्वात त्या मिठाचा सात्विकपणा तेव्हाच विरघळून नाहीसा होतो परंपरेचा अभिमान ऐतिहासिक महत्वाच्या दृष्टीने कितीहि अन्य आणि प्रशंसनीय असला, तथापि त्यांत पुराणप्रियतेच्या हट्टीपणाची खाजकुहिली पडतांच व्यावहारीक सृष्टीत तो अक्षम्य, निंद्य आणि हानीकारक ठरल्याशिवाय कधीहि रहात नाही. परंपरेचा ताठा आणि अनुवंशिक सरकाराची कल्पना, ही दोन खुळे कोणत्याहि पराक्रमी राष्ट्राची शक्ती खडी करून टाकण्यास पुरेशी आहेत. पुराणप्रियता ऊर्फ परंपरेचा फाजील ताठा म्हणजे काळाच्या ओघाबरोबर चालण्याची नाखुषी आणि अनुवंशिक संस्काराची कल्पना म्हणजे
शुद्ध तर्काची कादंबरी
पुराणप्रियता म्हणजे नव्या घोड्यावर जुनाच खोगीर बळजबरीने लादण्याचा अट्टहास आणि अनुवंशिकत्वाचे थेर म्हणजे जुन्या नव्या गोष्टी अदूर दृष्टीने एकाच ठरीव साध्यांत दडपिण्याचा मूर्खपणा. राष्ट्राच्या किंवा व्यक्तीच्या वयमानाचे प्रमाण लक्षांत न घेता पुराणप्रियता त्याला बोंडल्याबोंडल्यानेच दूध पाजण्याचा हट्ट धरते; तर अनुवंशिक संस्कार कल्पनेची एकाक्ष राक्षसी साचेवजा गुणधर्माच्या काल्पनिक स्थिरतेच्या मृगजळावरच तहान भागविण्याची मानवी समाजावर बळजबरी करते.
[२] हे काहीहि असले तरी एक गोष्ट निर्विवाद आहे की निसर्गप्रवृत्ति आणि मानवी प्रवृत्ति यांतल्या विरोधातूनच जगाच्या इतिहासाची उत्पत्ति झाली आहे, होत आहे आणि पुढेंहि होतच राहील. या विरोधाच्या झटापटींनींच मानवी सृष्टीचा इतिहास रंगून निघालेला आहे. आणि या विरोधातील विरोधी तत्व काढून टाकून त्यात एकवाक्यता आणण्याचा प्रयत्न जरी ज्ञानी जन करीत असले, तरी इतिहासाची सारी रुचि या विरोधानेंच स्वादिष्ट बनविली आहे. हे मात्र कबूल करणे प्राप्त आहे. निसर्गाची कांटेतोल प्रगमनशीलता आणि मानवांची दुराग्रही अप्रगमनशीलता या दोन गोष्टी कितीही परस्परविरोधी असल्या, तरी
जीवसृष्टीच्या इतिहासाचा आत्मा
या भेदाच्या विरोधाच चैतन्यपूर्ण केलेला असतो. जीवसृष्टी अत्यंत चलनप्रिय आहे आणि मनुष्यप्राणी हा जात्याच रुचिवैचित्र्याचा मोठा भोक्ता आहे. तथापि त्याचें रुचिवैचित्र्य, त्याची अमर्यादित महत्वाकांक्षा आणि साऱ्या ज्ञात सृष्टीवर हुकमत चालविण्याची त्याची कधीहि माघार न घेणारी निश्चयी वृत्ति, या सर्वावर ईश्वरदत्त एका देणगीचा दाब बसलेला असतो. हा दाब म्हणजे त्याच्या विवेकबुद्धीचा दाब होय. मानवी प्राण्याला विवेकबुद्धी ही परमेश्वराची खास देणगी आहे. याच देणगीनें त्याचें इहलोकाचें जीवित नियंत्रित झालेले आहे. मानवी बुद्धिमता कितीहि अचाट आणि कितीहि पराक्रमी असली, तरी तिला विवेकाचा कस लागल्याशिवाय तिची खरी मान्यता प्रगट व्हायची नाही. तिची खरी किंमत कळावयाची नाही आणि मानवी संसाराला तिचा काही उपयोगहि व्हावयाचा नाहीं इतकी जाणीव मनुष्यांत असते म्हणूनच त्यांना मनुष्यें म्हणतात. विवेकबुद्धी ही माणसामाणसांमधिल आत्मिक परिणततेच्या पायऱ्या दाखविणारी ‘मीटर’ शक्ती आहे. सृष्टी निर्माण करून, त्यात
मनुष्य प्राणी ही एक अजब चीज
उत्पन्न करण्यांत विधात्याचा हेतू काय असेल तो असो, पण मानवजातीचा आजदीनतागायत चळवळींचा इतिहास पाहिला तर त्यात प्रत्यक्ष विश्वविधात्याच्या अगम्य शक्तीच्या तोडीस तोड देण्याची त्याची खटपट अव्याहत सुरूच आहे, असे विधान करणे फारसे धार्ष्ट्यांचे होणार नाही. विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केल्याची गोष्ट जरी केव्हांहि ऐतिहासीक पुराव्यांनी सिद्ध होणें शक्य नाही. [आणि ती प्राचीन ग्रंथांत मुद्दाम घुसडण्याचा हेतू फार निराळ्या मनोवृतीतून जन्मलेला आहे, ही गोष्ट याचा ग्रंथात पुढे दाखविण्यांत येईल.] तरीसुद्धा आपल्या मृत पितरांना प्रत्यक्ष देवांच्या पंक्तीत नेऊन बसवायला मानवांनी बिलकूल कमी केलेले नाही. वाडवडीलांना खुद परमेश्वराच्या जागी नेऊन स्थापन करण्याची आणि अशा रीतीने आपला
पारमेश्वरी अंशाच्या वारसाचा हक्क
अविच्छिन्न सिद्ध करून दाखविण्याची प्रवृत्ति सर्व राष्ट्रांतील सर्व मानवात विशेष दिसून येते. विशेषतः हिंदी आर्यानी तर या बाबतीत दंतकथांचा आणि पुराणादि कादंबऱ्यांचा न भूतो न भविष्यति असा उपयोग आणि प्रसार करून घेऊन आम्ही अमूक ऋषींचे खास वंशजच आहोत असा एका प्रकारच नाटकी कौटुंबिक इतिहासच अस्तित्वांत आणून ठेविला आहे. हिंदी आर्याचे केवळ ऋषींच्या नुसत्या वंशजत्वावरहि समाधान झाल्याचे दिसत नाहीं, ऋग्वेद काळांतील पितरभक्तीच्या साध्याभोळ्या प्रेमपूर्ण कल्पनांवर त्यांनी आणखी एका कादंबरीचें जाडजूड पूट चढविलें आणि सृष्टीविधाता ब्रह्मदेव अशी एक नवीन देवी व्यक्ती आपल्या तरळ आणि चंचल कल्पनेतून प्रसवून, त्याच्या निरनिराळ्या अवयवांतून आपण स्वतःस त्यांनी प्रसवून घेतलें. भेदभावाचा उद्रम आपणांस याच ठिकाणी प्रथमतः आढळतो.
ऋग्वेद काळाच्या टळटळीत तीनसांजेच्या वेळी जेव्हां ब्रह्मदेवाच्या बाळंतपणाची कादंबरी अस्तित्वांत आली, त्याच वेळीं
ब्राह्मणीमताचें भेदभावाचें करटें
पालथें जन्माला आले आणि त्याच वेळी हिंदी आर्याची सर्व संस्कृति आणि सर्व वैभवहि पालथेंच पडलें !! सामाजिक सोईकरिता किंवा -- घटकाभर आपण असेंहि गृहीत धरून चालू की स्वार्थाकरितां -- माणसांनी खुद्द आपापल्यामध्ये जरी अनेक भेद, पंथ व जाती निर्माण केल्या आहेत, तरी विवेकाच्या शुद्ध दुर्बिणीतून आपण जर यच्चावत मानवी सृष्टी पाहिली तर त्यांत आपल्याला फक्त दोनच मुख्य भेद दिसतात, माणसांचे दोनच ठळक पंथ आढळतात आणि दोनच मुख्य जाती आपल्याला दृष्टीगोचर होतात. कोणत्याहि काळातले कोणतेंहि राष्ट्र कितीहि सुधारलेलें असो, त्यात नेहमी हे दोन ठळक भेद त्यांची नांवे काहीहि असोत असावयाचे आणि मानवांच्या सुधारणेचा इतिहास आपण किंचित् शांत व निर्विकार चित्ताने मनन केला तर आपल्याला एकच गोष्ट सप्रमाण पटेल की अगदी प्राचीनतम काळापासून मनुष्यांतल्या या
दोनच भेदातल्या झटापटी
ज्या त्या इतिहासाला मूळ कारणीभूत झालेल्या आहेत. मानवातील हे दोन अनादिसिद्ध भेद म्हटले म्हणजे ज्ञानी व अज्ञानी हे होत. संस्कृत व असंस्कृत सुधारक व रानटी, शिक्षित व अशिक्षित, यांपैकी किंवा अशाच तऱ्हेची दुसरी नांवें इतिहासांत अनेक आढळतील. तथापि ती ज्ञानी व अज्ञानी या दोन तत्वांचीच निदर्शक असतात. ही दोन तत्त्वें मानवी समाजाच्या सुधारणेची अथवा रानटीपणाची द्योतक असतात. ज्ञानाला प्रकाशाची आणि अज्ञानाला अंधकाराची उपमा देतात; आणि या दोघांतील भेदहि तितकाच स्पष्ट आहे. प्रकाश व अंधार यातील झगडा विश्वोत्पत्तीच्या काळापासूनचा आहे आणि तो विश्वसंहाराच्या (जर विश्वसंहार कधिकाळी खरोखरच व्हायचा असेल तर) शेवटच्या घटकेपर्यंत असाच चालायचा. हीच गोष्ट मानवांतील ज्ञान व अज्ञान यांची होय. साऱ्या जगाला सर्व मानवजातीला सुविध व ज्ञानी करून सोडण्याची कोणी पैज मारली, तर त्या सज्जनाच्या सद्धेतूबद्दल जरी त्याची प्रशंसा करणे वाजवी होईल, तरी त्याच्या पैजेच्या अव्यवहार्यतेबद्दल त्याची कीव करणे तितकेंच भाग पडेल. कोणीतरी सुधारक आणि कोणीतरी रानटी, कोणीतरी ज्ञानी आणि कोणीतरी अज्ञानी, हा क्रम जगाच्या अंतापर्यंत असाच चालावचा. यांतच
सृष्टीच्या संसाराची खरी मख्खी
आहे. यावरच जगाच्या इतिहासाचा प्राण अवलंबून आहे. प्रकाश अंधाराला चीत करण्याचा यत्न करतो, तर अंधार प्रकाशाला आमूलाग्र गिळूनच टांकण्याची पैज मारतो. ज्ञानी अज्ञान्याला दादा बाबा करून, किंवा वेळीं कान पकडून, त्याच्या तोंडांत बळेंच ज्ञानामृत कोंबण्याचा यत्न करतो. तर अज्ञानी तें अमृत थुंकून टाकून ज्ञान्यावर दुगाण्या झाडतो. ज्ञान डोळस असल्यामुळे ‘पृथ्वीवर माझीच एकमुखी सत्ता चालू पाहिजे असा न्याय्य हट्ट धरतें, तर अज्ञान म्हणते की या पृथ्वीवरचा मूळचा रहिवाशी आहे.
मी या पाहुण्या आणि परक्या ज्ञानाची येथे मुळींच डाळ शिजू देणार नाहीं, मीचे येथला आद्यसत्ताधारी आहे.’ ज्ञानाला जर देवाची उपमा दिली तर अज्ञानाला दैत्याची देणें सरळच होईल. ज्ञानाला आर्य म्हटलें तर अज्ञानाला दस्यूच म्हटलें. पाहिजे. जगाच्या प्राचीन उपलब्ध इतिहासाचे पहिलेच पान उघडून पाहू लागताच हा देव दैत्यांचा किंवा
आर्य दस्यूंचा झगडाच
आपल्या नजरेस प्रथम पडतो. हा झगडा सनातन असल्यामुळे तो अजूनपर्यंत आहे तसाच चालू. आहे. यांत कांहीं आश्चर्य नाहीं. मात्र त्यांचे स्वरूप सांप्रत अजीबात बदलले असून, कांहीं ठिकाणी तर तें चिळस येईल इतकें विपर्यांसी बनले आहे. आर्यांचा आणि दस्यूंचा झगडा किंवा संस्कृत समाजांचा असंस्कृत समाजांशी झगडा कंठपर्यंत प्रशंसनीय ठरतो. याचीही काहीं विशिष्ट विवेकमर्यादा ठरलेली आहे. कोणतीहि गोष्ट मर्यादेबाहेर गेली की तिच्याबद्दल कोणालाहि चिळसच उत्पन्न व्हायची; मग त्या गोष्टीचा कर्ता देव असो वा दैत्य असो, आर्य असो नाहीतर दस्यू असो अत्यंत प्राचीन काळी हिंदु आर्यजन ज्ञानी होते. त्यांची सर्व प्रकारची संस्कृति फार उच्च दर्जाची होती. त्यांनी तिच्या जोरावर अर्शी सनातन धर्मतत्वें शोधून काढली की प्रचलीत मन्वंतरांतील कुशाग्र शास्त्रीय शोधांनाहि त्यांच्यापुढे मान वांकविणे भाग पडत आहे. या (The Vedic Dharma, however, never feared scientific advancement, nor was it ever guilty of the terrors of the Inquisition. It never shed the blood of Galilio, a Copernicus or a Bruno.
Hindu superiority p 394.
(2) The Hindus regard God as present in the mosques, with those who kneel before the cross, and in the temple where Brahma is worshipped. And is not this Faith more in accordance with the true doctrine of Christ than that which lighted the Auto da fe for the infallibility of the Popes, for the divinity of Mary, and for the miracles of the saints?
Theogony of the Hindus. pp. 67-68.
(3) India is the mother of religion. In her are combined secience and religion in perfect harmony, and that is the Hindu Religion, and it is India that shall be again the Spiritual Mother of the world.
Lecture at the Grand Theatre, Calcutta, delivered on 15th Jan. 1906)
सर्व गोष्टी कितीहि खऱ्या असल्या, इतिहासांत त्याला कितीहि भरभक्कम आधार असला, फार काय, पण आमच्या कट्टया हाडवैन्यांना [ जर खरोखर कोणी आमचे हाडवैरी असतील तर !] जरी त्या अगदी अक्षरशः मान्य असल्या, तरी त्याच प्राचीन परंपरेचा गर्वभार वहाणारे तेच हिंदुलोक सांप्रत कोणत्या स्थितीत आहेत? आमचा धर्म सनातन वैदिक धर्म (The present religion of the masses in India should not be literally taken to be the religion of their ancestors, and the nature of their religion should not be judged from the religious system of the modern Hindus. The once highly spiritual religion of the Hindus has, so far as the masses are concerned, now become thoroughly materialised to mark their degradation, and the things earthly are now installed in the place which was once occupied by the eternal principle of all things......... The Vedic Religion was not like the so-called Hindu religion of the present day, exclusive and confined to Indians. It was Universal, and non Indians like the Greeks, Scythians, Huns and others, were included in its fold. Inscriptions recently discovered show that Greeks and others embraced Hinduism and were freely admitted in Hinduism.
Hindu Superiority. pp, 388 & 392) असे मोठ्या अभिमानाने सांगणारे हिंदू आज खरोखर कोणता धर्म आपल्या प्रत्यक्ष आचरणानें पाळीत आहेत? सांप्रतचा हिंदुधर्म म्हणजे विश्वव्यापकतत्त्वांची साऱ्या जगभर दुंदुभी धडकविणाराच वैदिक हिंदुधर्म आहे काय ? ज्यांनी ऋग्वेद रचला त्याच आर्यांचे आम्ही खास वंशज आहोत. अशी साऱ्या जगापुढे जबानी देणारे आजचे हिंदु
साऱ्या जगाचे गुलाम आणि मजूर
कां झाले आहेत? प्राचीन आर्यांनी घालून दिलेले धार्मिक, सामाजीक, राजकीय, आर्थिक इ बाबतींतले उदात्त तत्त्वाचे घडेच आजचे हिंदु म्हणविणारे लोक घटवीत आहेत की त्यांत त्यांनी कांही सुधारणा केली आहे? सुधारणा म्हणत असाल तर तुम्ही आज इतक्या नरकवत हीन स्थितीत का? ज्या हिंदु धर्माच्या प्रसाराचा विळखा ‘पृथिव्यां सर्व मानवः’ वर पडलेला होता. तो सपशेल दिला पडून अखेर त्याच्या प्रसाराचे क्षेत्र टिटवीच्या चोचीइतकें संकुचित का बनले आहे? या किंवा असल्यास प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळत नाहींत. अलीकडे काही हिन्दू आपणांस `हिन्दु` न म्हणवितां, व्याख्यानांत टाळ्या मिळविण्यासाठी `आर्य` म्हणतात; परंतु आर्याच्या संस्कृतीचा शतांश तर राहूद्याच, पण त्यांच्या रक्ताचा सहस्त्रांश तरी आजच्या या नामधारी आर्यात उरला आहे काय? आजला हिन्दु म्हणजे साऱ्या जगाची एक तिटकाऱ्याची वस्तु होऊन राहिली आहे. जगाच्या पाठीवर तिकडे पहाल तिकडे हिन्दूंना गचांड्या मारमारून हद्दपार करीत आहेत. हिन्दु आपल्या भूतकालीन ऐश्वर्याबद्दल वाटेल तितक्या लंब्याचौड्या गप्पा मारोत, आज त्याना जगांत कोणीहि मोन देत नाहींत, ही गोष्ट नाकबूल करता येणार नाहीं. कोणी त्यांना हिंडोस म्हणतो. कोणी जेन्टू म्हणतो कोणी इंदोस म्हणतो. कोणी नेटीव म्हणण्यांतच धन्यता मानत पैगबरांची खैर, त्याना कोणी हैदोस किंवा ऑइस्टर (खेकडें) अझून म्हणू लागला नाही. हिंदूची सांप्रतची समाजव्यावस्था, वर्णव्यवस्था, जातिभेद, धर्मव्यवस्था इत्यादि परिस्थिति इतक्या नीचतम दुरावस्थेला येऊन भिडली आहे की पुराणेंरूपीं काल्पनीक कादंबऱ्यांची वार्ड प्रसविणाऱ्या नामधारी भोंदू व्यासांनी वर्णन केलेल्या नरकाच्या स्थितीचे हुबेहुब चित्र आज प्रत्यक्ष हिंदुसमाजांत पहावयास मिळणे शक्य झाले आहे.
(2) Like other peroples the modern Hindus are in varying degree of mixed stock.........One has only to look at a fair high caste Brahmana and a Dangar...... India contains all type of cultute extending alomost from the neolithic to the present age........ ...The recial tangle is such that one hesitates to base conclusions on it.
THE SEED OF RACE, by Sir John Woodroff. pp. 16-17.) जातिभेदाचे तट राजीखुषीने व अक्कलहुषारी अधिकाधिक कणखर करण्यांत प्रत्येकजण अगदी चूर होऊन गेला आहे. इतकेच नव्हें तर असे करण्यात महत्पुण्य आहे. धर्मार्थ यथासांग प्रतिपालन होत आहे आणि मोक्षाला बिनचूक जाण्याचा राजमार्ग हाच आहे. अशा प्रकारच्या चिथावण्या देण्यांत धर्मसंरक्षणांची भाडोत्री वाहणाऱ्या भिक्षुकशाहीस तर मुळीच दिक्कत वाटेनाशी झाली आहे. देशकालवर्तमानाप्रमाणे धार्मिक, सामाजिक किंवा राजकीय जीवनांत कमीअधिक चिवटपणा आणण्याची प्राचीन उदार मनोवृत्ती अज्जीबात नष्ट झाली असून पूर्वीच्या चातुर्वर्ण्यांचे पर्यवसान सध्या इतक्या असंख्य जाती पोटजातीत झालेले आहे की ब्रिटीश सरकारने राजद्रोहाच्या अपराधाबद्दल एखाद्याला जन्मठेप काळ्या पाण्याची शिक्षा न देता, त्याला हिंदूच्या जाती पोटजातींची मोजदाद करण्याची शिक्षा ठोठावल्यास, ‘मला या क्रूर शिक्षेपेक्षा दयाळू मायबाप सरकारने ताबडतोब
फांशीची शिक्षा देण्याची मेहेरबानी
करावी असे अपील प्रिव्ही कौन्सीलांत दाखल केल्याशिवाय तो खास राहणार नाहीं. चार वर्णाच्या चाळीस हजार जाती ? त्याही पुन्हा एकमेकांपासून अलग- नव्हे एकमेकांच्या प्रतिस्पर्धी ? मॅडमुल्ला गांधीच्या नान्कोऑपरेशनच्या कट्ट्या पुरस्कर्त्या!! ज्ञानिपणाचा किंवा अज्ञानिपणाचा, श्रेष्ठत्वाचा आणि निचत्वाचा, प्रभुत्वाचा आणि गुलामगिरीचा मक्ता जन्मसिद्ध ठरलेला. मी ब्राह्मण का तर माझी आई आणि बाप ही ब्राह्मण म्हणवितात किंवा ब्राह्मणाच्या सदराखाली मोडतात म्हणून मी ब्राह्मण. म्हणूनच मी जन्मसिद्ध ज्ञानी, जन्मसिद्ध श्रेष्ठ आणि जन्मसिद्ध पूज्य.
मी कितीही महामूर्ख असलो, कितीही दुर्वर्तनी, दुराचारी, भ्रष्ट, पतित, आहो फार काय, पण खुद्द चांडाळालाहि लाज वाटेल अशी अनन्वित दुष्कृत्यें करण्यांत निर्ढावलेला असलो, तरीसुद्धां
मी जन्मसिद्ध ब्राह्मण आहे
या एकाच अधारावर मी या लोकींचसा काय पण त्रैलोकीही वंद्यच आहे. ब्राह्मण ब्राह्मण म्हणजे काय समजतां ? मनुस्मृति (मनुस्मृति हा ग्रंथ अगदी अर्वाचीन आहे. बौद्ध धर्माचा सणसणीत रहा पाठीत बसल्यावर ब्राह्मणी माची पेकाटे पार पिचून गेली. परंतु पुढे बौद्ध धर्माचा ऱ्हास झाल्यानंतर ब्राह्मणानी पुनश्व [इ. स. पूर्वी एक दोन शतकांपासून पुढे] आत्मस्तोमाच्या दुगाण्या झाडण्यास सुरुवात केली आणि ब्राह्मणी वर्चस्वावर शास्त्रोक्त व्याख्याने झोडण्यास जी ग्रंथाची भट्टी निर्माण केली त्याच मट्टीतून मनुस्मृति निर्माण झालेली आहे की चा सुळसुळाट पुढं याच प्रथांत वर्णन केलेला आहे.)
काय सांगते ? "धर्मतो ब्राह्मणः प्रभुः १-९३] उत्पत्तिरेव विप्रस्य मूर्तिर्धर्मस्य शाश्वती | हि धर्मार्थमुत्पन्नो ब्रह्मभूयाय कल्पते। [१-१८] ब्रह्मा या सर्व सृष्टीचा प्रभु आहे. केवळ ब्राह्मणाच्या शरीराची उत्पत्ति हेंच धर्माचें अविनाशी शरीर होय. ब्राम्हण हा प्राणी धर्माकरितांच उत्पन्न झालेला आहे. यास्तव तो आत्मज्ञानाच्या द्वारा मोक्षास जातो" [आणि ब्राह्मणेतर ब्राह्मणांच्या मध्यस्थीशिवाय किया हातलावणीशिवाय मोक्षाला मुळींच जाणार नाहीत की काय? [अझूनहि खात्री पटत नसेल तर घ्या आणखी एक मनुस्मृतीचा वळसा :
ब्राह्मणो जायमानो हि पृथिव्यामधिजायंते | ईश्वरः सर्वभूतानां धर्मकोशस्य गुप्तये ॥ ९९ ॥
सर्वं स्वं ब्राह्मणस्येदं यत्किंचिज्जगतीगतम् ॥ श्रेष्ठयेनाभिजनेनेदं सर्व वै ब्राह्मणोऽर्हति ॥ १०० ॥
स्वमेव ब्राह्मणो भुङ्क्ते स्वं वस्ते स्वं ददातिच ॥ आनृश्यं स्याद्ब्राह्मणस्य भुजते हीतरे जनाः ॥ १०१ ॥
--अध्याय १ ला.
कारण उत्पन्न होणारा ब्राम्हण पृथ्वीमध्ये सर्वांत श्रेष्ठच उत्पन्न होतो. सर्व भूतांच्या धर्मसमूहाच्या रक्षणार्थ तो प्रभु आहे. या जगामध्ये जेवढे म्हणून धन आहे ते जणू सर्व ब्राह्मणांचेंच आहे. कारण श्रष्टता व कुलीनता या दोन गुणांमुळे त्या सर्वास ब्राह्मण, योग्य आहे. ब्राह्मण जे काही दुसऱ्याचेहि खातो तें तो वस्तुतः आपलेच खातो. जें वस्त्र दुसऱ्याकडून घेऊन नेसतो ते तो आपलेच नेसतो व जे एकाकडून घेऊन दुसऱ्यास देतो तेहि आपलेच देतो. आणि असा प्रकार असल्यामुळे केवळ ब्राह्मणांच्या करुणेमुळेच इतर जन भोजनादि करितात." आचार्यकर्ते बापटशास्त्रीकृत भाषांतर पू. ११-१२ ) काय ? वाचलेत मनु काय म्हणतो तें ? अर्थात मी ब्राह्मण आहे, तेव्हां अखिल मानव जातीचा मी गुरू आहे, अखिल विश्वाचा प्रभु आहे, मनुस्मृति ही माझी दंडनीति आहे आणि ती सृष्टी निर्माण होण्यापूर्वीच
ब्रह्मदेवाच्या नाकांतून निर्माण झाली
म्हणून ब्राह्मणेतर साऱ्या दुनियेनें माझे पाय धुतलेले पाणी तीर्थ म्हणून प्राशन करावे एवढा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. ही ब्राम्हण म्हणविणाऱ्या प्राण्यांची कल्पना | निसर्गसिद्ध प्रजोत्पादनामुळे प्राप्त होणाऱ्या जन्माचा केवढा हा महिमा !! या महिम्याच्या सिद्धीप्रीत्यर्थ गेल्या तीन हजार वर्षे ब्राह्मण म्हणविणारांनी न भूतो न भविष्यति उलाढाली आणि खटपटी केल्या आहेत. त्या खटपटींचा इतिहास ब्राह्मणेतर समाजांनी नीटसा विचारात न घेतल्यामुळे
ब्राह्मणांच्या जन्माप्त वर्चस्वाचें भूत
त्यांच्या बोकांडी आज जवळ जवळ कायमचेंच बसले आहे, असें म्हणण्यास हरकत नाही. परंतु अलेक्झांडर पुरुरवा (पोरस) राजाला का जिंकले म्हणून पृच्छा करणे जितके ठरेल तितकेंच क्षत्रिय वैश्यादिब्रह्मणांनी निर्माल्यवत् कां केलें असा प्रश्न विचारण्यातहि ब्राह्मणेतरांवर अज्ञपणाचा आरोप येतो. आधी तुम्ही जिंकलाच का गेलात? ब्राह्मणांची गुलामगिरी तुम्ही होऊन का मान्य केलीत ? हेच प्रश्न ब्राह्मणांच्या प्रतिस्पर्ध्यानीं वास्तवीक स्वतः सच विचारायला पाहिजेत. अमूक एक समाज शिरजोर झाला, त्याच्या खऱ्याखोट्या वर्चस्वाखाली इतर समाजांना मान वाकवावी लागली आणि अखेर ते त्याचे बौद्धिक गुलाम बनले, तर या सर्व अपक्रांतीला जबाबदार ते गुलामच होत. आपण गुलामगिरीच्या क्षेत्रांत हळुहळू नकळत फेकले जात आहोत, आपल्या शरिरीक सामर्थ्याची सर्वत्र वाहवा होत असतांनाच बौद्धिक सामर्थ्यात आपल्याला कवडीमोल करून टाकण्यासाठी एक विवक्षित समाज गुप्त कारस्थानें करीत आहे. आणि तोंडानें स्वार्थत्यागाच्या संहितेचे पाठ जोरजोराने घडघड घडघड चालू असतानाच, त्याच्या हृदयांत निर्भेळ स्वार्थसाधूपणाची धडपड रात्रंदिवस सुरू आहे. या गोष्टी ओळखिण्याची ज्या ज्या व्यक्तींची अगर समाजांची दूरदृष्टी फुटली असेल, त्यांनी आपल्या बौद्धिक गुलामगिरीबद्दल कितीहि हृदयद्रावक आक्रोश केला, अथवा निराशेच्या संतापाने केववाह निषेधपूर्ण जागा केला तरी त्यांबद्दल जगानें काय म्हणून अनुकंपा दाखवावी ? क्षत्रियांची बदनामी करणारे खोटे दस्तऐवजी पुरावे स्मृतिपुराणादि ग्रंथांत स्वार्थी ब्राह्मणांनी घुसडण्याच्या वेळींच जर
ब्राह्मणांच्या नरड्यावर क्षत्रिय
बसले असते, तर आजला त्यांना शूद्र शूद्र असें ब्राह्मणांनीं धिःकाराने म्हणतांच, त्यांच्या खाडकन् मुस्कटांत भडकविण्याचा अतिप्रसंग टळला नसता काय? मागासलेले आणि पुढारलेले असा जो एक आधुनीक भेद सांप्रत द्वैताच्या आखाड्यांत अस्तन्या वर सारून उतरला आहे, त्यांतल्या मागासलेल्या पक्षाला आम्ही हाच प्रश्न स्पष्ट विचारूं की "भाऊ ! तूं इतक्या दिवस मागे कां पडून राहिलास?" मनुष्य प्राणी हा जात्याच मोठा स्वार्थी आहे, आणि ब्राह्मणांनी स्वार्थाची आराधना आजपर्यंत जितकी केली आहे, तितकी त्यानी परमेश्वराचीसुद्धा केलेली नाही. असे नसतें तर ब्रह्मविद्येसारख्या गूढ विषयाचा गुरूपदेश प्राप्त करून घेण्यासाठी "संस्कारस्य विशेषाश्य वर्णानां ब्राह्मणाः प्रभुः [ मनु. १०-३] उत्पत्तिरेव विप्रस्य मूर्तिर्धर्मस्य शाश्वती [१-९८ ]" असे धमेंडीचे आत्मस्तोमनिर्देशक उद्गार काढणाऱ्या सांप्रतच्या ब्राह्मणांच्या वाडवडिलांना क्षत्रिय महर्षीच्या पायावर लोळण घेण्याचा प्रसंग कशाला आला असता? क्षत्रिय जात्याच अत्यंत निःस्वार्थी या त्यांच्या लौकिकाची गेली सहा हजार वर्षांचा इतिहास ग्वाही देत आहे. ब्राह्मणांनी स्वार्थलोलुप होऊन इतर त्रैवर्णिकांच्या निःस्वार्थतेचा आणि अनुकंपापूर्ण मृदुल मनोवृत्तिचा फायदा घेऊन, त्यांचा सर्व प्रकारचा दर्जा कवडीमोल ठरविण्याचे जे जे फंद उपस्थित केले, त्यांची ठिकच्याठिकाणी जर सर्वसमर्थ ("While the priestly caste was still maltiplying rituals and supplying dogmatic explanations for each rite, the royal caste seems to have felt some impatience at this priestly pedantry Thinking and earnest Kshatriyas asked themselves if these rites and dogmas were all that religion could tench Learned Kshitriya, while still conforming to the rites laid down by priests, gave a start to healthier speculations and inquired about the destination of and the Soul and the nature of Supreme Being. So bold, so healthy and vigorous were these new earnest speculations, that the priestly classes, who were wise in their own esteem, at last felt their inferiority and came to Kshatriya to learn something of the wisdom of the new school.
ऋग्वेदकाळीं जाती मुळीच नव्हत्या.
त्या काळच्या राजन्याचे (क्षत्रियांचे) विप्र शागीर्द पुढे भारत काळाच्या अखेरी अखेरीस धंदेवाईक ब्राह्मण बनले आणि महाभारतकाळी हिंदी आर्याच्या धार्मिक विधींचा सर्व मामला आपल्याकडे घेऊन, पुराणकाळी तर ते हिंदुधर्मांच्या ठेवीवरचे भुजंग (As the Aryans spread their empire over India, the ghostly influence of the Brahmans increased In their hands the Vedic religion underwent a profound change The divisions of the four great castes (Brahmans, Kshatriyas or warriors, Vaishyas or traders and Shudras or serfs) were mapped out in rigid damarcation The idea of sacrifice grew to an enormous degree to connoting as it did the spiritual supremacy of the Brahmans in every sphere, laid a crushing incubus upon the whole of Indian life. The entire wheel of the world was enjoined to depend upon he sacrificial ritual, the key of which was in the hands of the Brahmans. To this end were compiled about 800 BC. (2) the Brahmanas, huge works exposing and commenting upon the ritual application of the Vedic Texts Barnett`s Hinduism pp. -11-12.) बनले. महाभारत काळच्या व पुराण काळच्या ब्राह्मणांच्या कृत्यांचा इतिहास म्हणजे एक स्वार्थवेद च होय. त्यांनी स्वतःच्या आत्मस्तोमालासुद्धा धार्मिक विधींच्या देव्हाऱ्यात बेधडक नेऊन स्थापन केलें आणि धार्मिक प्रदेश कब्ज्यांत आल्यावर अखेर त्यांनी
सामाजिक प्रदेशांतसुद्धां दंगल
माजविण्यास कमी केलें नाहीं. या दंगलीचे पर्यवसान अखेर भारतोत्तर काळीं बौद्ध आणि जैन धर्माच्या स्थापनेत झाले. हिंदुधर्माच्या इतिहासांत बौद्ध व जैन-विशेषतः बौद्ध-धर्माच्या स्थापनेचे महत्व विशेष आहे. आज बौद्ध धर्म जरी हिंदुस्थानांतून हदपार झाला आहे, तरीहि त्याच्या लोकशाही कर्तबगारीचे ऋण हिंदुधर्मावर बरेच झालेलें आहे, ही गोष्ट विसरून चालावयाचें नाहीं. या धर्माने ब्राह्मणांच्या अत्याचारी प्रवृत्तीला असा कांही सणसणीत टोला लगावला की पुढे कित्येक शतकेंपर्यंत मद्यमांसांत लोळणाऱ्या ब्राह्मणांना नाकें मुठीत धरुन निःशब्द अज्ञातवास कंठावा लागला. बौद्ध धर्म हें धार्मिक सामाजिक आणि बौद्धिक गुलामगिरीच्या विरुद्ध एक क्रांतिकारक बंड म्हटले तरी चालेल. निसर्गप्रवृत्ति आणि मानवी प्रवृत्ति यांचा तुलनात्मक अभ्यास सुरु होताच, त्यांतील घर्षणानें जी नवविचारांची ठिणगी उत्पन्न होते, तीच या बंडाचा अग्नि भडकवून देते आणि मानवी समाजाच्या कल्पनाक्षेत्रांत साठलेल्या पुराणमतवादाच्या केरकचऱ्याचे पर्वतच्या पर्वत जाळून भस्मसात् करते. या नवविचाराच्या ठिणगीनेंच जगांत इतिहासाची पुनरावृत्ति घडून येत असते आणि याच पुनरावृत्तीच्या झंजावाताला तत्वज्ञानी जन
परमेश्वराच्या अवतराची उपमा
देतात. हिंदूनी गौतम बुद्धाला आपल्या अवतारपरिषदेत याच कारणामुळे बहुमानाची खुर्ची दिलेली आहे. गौतम बुद्धाने नवविचाराच्या खड्गाने भिक्षुकी जीर्ण मतांचा चक्काचूर केला. सॅवेज नामक एक तत्त्ववेता म्हणतो की The man of thought strikes deepest and strike safely. नवविचारी मर्दाचा वज्रप्रहार बिनचूक आणि काळजाला जाऊन भिडणारा असतो. गौतम बुद्धाच्या बौद्ध धर्मानें हिंदु धर्माच्या इतिहासांत हीच प्रशंसनीय कामगिरी बजावलेली आहे. या कामगिरीने ज्ञत्रियांची उदात्त सरदारी मनोवृत्ति आणि ब्राह्मणांची संकुचित स्वार्थी मनोवृत्ती यांचा तौलनिक इतिहास जगापुढे हडसून खडसून मांडला गौतम बुद्धाच्या नवविचाराचा अवतार जर हिंदुधर्माच्या क्षेत्रांत झाला नसता, तर यज्ञातील मद्यमांसाच्या रेळचेळीला लालचटलेल्या ब्राह्मणांनी वैदिक धर्माची किती भयंकर अनावस्था केली असती, त्याची कल्पनाच केली पाहिजे. गौतम बुद्धानें आपल्या
नवविचाराच्या मोहरीचें प्लास्टर
भिक्षुकी मताच्या मस्तकावर मारून त्यांच्या अत्याचारी प्रवृत्तीचा मेंदू जरी ठिकाणावर आणला. तरीहि ज्यांनी पुराणादि काल्पनीक कादंबऱ्यांच्या जोरावर हिंदुजनांच्या धार्मिक कल्पना भ्रष्ट आणि पतित करून टांकण्यास सोडलें नाहीं, त्यांना गौतम बुद्धानें जर त्या वेळीं यथास्थित ठेचण्यास कांकुं केलें असतें, तर आजला वांद्र्याचे कसाईखाने हिन्दुधर्माची मोक्षदाती मंदिरें बनल्याशिवाय खास राहिले नसते.
[४] हिंदू लोकांच्या अवनतीला जीं कांहीं अनेक कारणे झाली, त्यांतच अनादिसिद्धत्वाची कल्पना ही एक राक्षसी आहे. याच राक्षसीच्या उदरांतून मायावाद जन्मलेला आहे.
नवविद्वेषाचे (Conservatism) पिंड खाऊन खाऊन फुगलेल्या या मायावादाने हिंदु लोकांना खरेखुरे नामर्द बनवून त्यांची जीवनसंवेदना अगदी ठार मारून टांकली आहे. या मायावादाने त्याना कड़े निराशावादी बनविल्यामुळे जगाच्या संसारांत किंवा जगाच्या चतुर्वर्गव्यवस्थेत त्यांना आज शूद्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. जे हिंदु राष्ट्र पूर्वी साऱ्या जगाला पदाक्रांत करणाऱ्या
विजयी वीरशिरोमणीचें माहेरघर
म्हणून ख्यात होते, तेंच राष्ट्र आता गुलाम आणि मजुरांचा साऱ्या जगाला पुरवठा करणारी टोलेजंग वखार बनली आहे. नित्य व्यवहारातील प्रत्येक गोष्टींचे अथवा बदलणाऱ्या प्रत्येक परिस्थितीचे कर्तृत्व परमेश्वराला देणे ही गोष्ट तत्वज्ञानदृष्ट्या जरी मोठी प्रशंसनीय असली, तरी ‘सर्व होणे जाणे तुझ्या हाती’ अशा कल्पनेनें शुद्ध निराशावादांत आयुष्यभार कंठणारा मानवीसमाज साऱ्या जगाचा गुलामच झाला पाहिजे. परिस्थिति अनादिसिद्ध, जन्म अनादिसिद्ध, जाती अनादिसिद्ध, ब्राह्मणांचे ब्राह्मण्य अनादिसिद्ध, शूद्रांचे शूद्रत्व अनादिसिद्ध, वैधव्य अनादिसिद्ध, वेद उपनिषदे अनादिसिद्ध आणि पुराणे स्मृत्या यासुद्धा अनादिसिद्धच!
इंग्रेजांचें ओंवळें म्लेंच्छ राज्य
हिंदुस्थान होण्यापूर्वीचे हिंदुलोकांचे सर्वप्राचीन अर्वाचीन ग्रंथ परमेश्वराच्या उच्छ्वासापासून निर्माण झालेले! परिस्थिति कोण आणली? देवाच्या इच्छेनें जन्म कोणी दिला ? देवाने. जात जन्मसिद्ध का? देवाची मर्जी. ब्राह्मण जन्मसिद्ध पूज्य कां? वेद तसे सांगतात म्हणून, आणि ‘यस्य निश्वासित वेदं’ - वेद देवाचे सुस्करे ! शूद्राने शूद्रवृत्तीतच खितपत राहिले पाहिजे काय? अलबत् शूद्रत्व देवाने दिले आहे. विधवेने वैधव्यांतच आयुष्य का कंठावें आणि मसणवटीत सरण ज्याची वाट पहात आहे अशा
वेशासंपन्न सोमयाजी वृद्ध कपी
नें कोवळ्या कुमारिकेचे पाणीग्रहण करण्याची मरता मरता तातड का करावी ? वेदांची आज्ञा आणि देवाची मर्जी म्हणून ! हिंदुस्थानात दुष्काळामुळे कोट्यावधि जीव अन्न अन्न पाणी पाणी करून प्राण सोडीत असतांनाहि त्यांची कीव न करता, पुत्र मेला असता सुनेला विकेशा करण्याकरिता, अगर बाप मेला असता मातृदेवतेची न्हाव्याच्या हातून शुद्धी करण्याकरिता, जवळ पैसे नसले तरी
चक्रवाढ व्याजानें मारवाड्याचें कर्ज
काढून नाशिकच्या न्हाव्याभटांची धणि करण्याकरिता लोक धांवत जातात ते का? धर्माची आणि देवाची तशी आज्ञा आहे म्हणून! अरेरे हिंदुधर्मांची काय ही अनावस्था आणि त्याच्या शुद्ध तत्वज्ञानाची काय ही विटंबना !! प्रत्येक आचार विचार किंवा परिस्थिति हीं देवानेच केली आहेत किंवा देवानेच नेमून दिलेली आहेत असे मानणे ही मानवी समाजाच्या अत्यंत निकृष्ट मनोभावनेची स्थिति होय. समाजशास्त्रदृष्ट्या असल्या मनोवृत्तीचा समाज नीच दर्जाचा असे ठरत असल्या समाजाच्या नशिबी साऱ्या संस्कृत जगाची गुलामगिरी करण्याची शूद्र वृत्तीची हमाली लागल्यास त्यांत आश्चर्य मानण्याचे काही कारण नाही. प्रो. भाटे म्हणतात, “आमच्या धर्मशास्त्रकारांनी समाजशास्त्रज्ञांच्या मूलभूत तत्वांवरच कुऱ्हाड घातली आहे. त्यांनी व्यक्तीला आमचे दरवाजे मुळींच खुले ठेविलेले नाहीत. असल्या नियमांनी समाजाची सुधारणा होणे अशक्य आहे. धर्मशास्त्रकारांनी घालून दिलेल्या आज्ञप्रमाणे निमूटपणे वागणाऱ्या समाजातील व्यक्तीचे विचार गुलामाला योग्य असेच बनतात. अशा व्यक्तींचा आणि कैद्यांचा आयुष्यक्रम सारखाच आमचे प्रत्येक आचार नियमबद्ध करून टाकणाऱ्या शास्त्रकारांनी आम्हा सर्वस्वी परावलंबी करून टाकल्यामुळे आमची प्रगति बहुतेक खुंटल्यासारखी झाली आहे. आम्ही बौद्धिक वादविवाद करूं आणि तो करीत असता आमच्या चुका आमच्या नजरेस येऊन एखाद्या प्रश्नासंबंधाने आमची खात्रीहि कदाचित होईल. पण खात्रीप्रमाणे वागणूक मात्र आमच्या हातून कधीहि होणार नाही, कारण, आमच्यातील
आत्मविश्वास पार नाहींसा झाला
आहे. आमच्या स्वतः मध्ये काही कर्तबगारी आहे आम्हाला काही बुद्धी आहे. विचारशक्ति आहे.
असे आम्हाला मुळीच वाटत नाही. गैलिलियोसारखी विचार करून आपले मत स्पष्टपणे लोकांपुढे मांडून सत्याकरिता कष्ट सोसणारी माणसे, आमच्या देशांत फारशी निर्माण झाली नाहीत ती आमच्या ह्या परावलंबीपणामुळेच [समाजशास्त्रावरील व्याख्याने ८१-८२] गेल्या दीड दोन हजार वर्षांचा इतिहास पाहिला म्हणजे हेच दिसून येते की बौद्धधर्माच्या ऱ्हासानंतर ब्राह्मणी मतांनी जी एकदम चोहीकडून उचल केली, त्या उचलीत भिक्षुकी उचल्यानी संबंध हिंदुसमाजाचे विचारस्वातंत्र्य उचलून नेलें आणि आपल्या स्वार्थी शाबरी मंत्रांच्या प्रभावाने त्याच्या बौद्धिक सामर्थ्यालासुद्धा नपुंसक बनविले. ब्राह्मणांनी आपल्या शुद्ध आचरणाच्या आणि अनुवंशिक बुद्धिसामर्थ्याच्या जोरावर हिंदुसमाजांत अग्रस्थान पटकविले, असे मोठ्या दिमाखाने सांगणाऱ्या शहाण्याचा कान पकडून आम्ही त्याला बजावून सांगतों की दादा, आत्मस्तोमाच्या कोरडया कणग्यांतून बाहेर येऊन प्रथम इतिहास पहा. ब्राह्मणांच्या वर्चस्वाचे किंवा उत्तमपणाचे मूळ त्यांच्या अनुवंशिक बुद्धिसामर्थ्यात नसून बहुजनसमाजाच्या डोळ्यांत खोट्यानाट्या धार्मिक कल्पनांची धूळ फेंकून त्यांच्या बौद्धिक स्वातंत्र्याला खच्ची करण्यांतच सापडते, हिंदु धर्माच्या मूलभूत प्राचीन कल्पना व तत्वे पहा आणि सध्याचे हिंदुधर्माचे भ्रष्ट पतित आणि शिसारी आणणारे अनीतिपूर्ण स्वरूप पहा म्हणजे धर्मसंरक्षणाची जबाबदारी आपण होऊन आपल्या शिरांवर घेणाऱ्या ब्राह्मण वर्गाचा जुलमी खेळखंडोबा तेव्हांच प्रत्ययाला येईल.
मार्टिन लूथरचें बंड
होण्यापूर्वी युरोपात क्रिस्ती पोपांनी आणि पाद्र्यांनी जसा जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन, त्यांच्या गळ्यांत आपल्या नाटकी पवित्र वर्चस्वाची धोंड अडकविली होती. तोच प्रकार सध्या हिंदुस्थानांत ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यांत चालू आहे. क्रिस्ती पोप आणि पाद्री म्हणत असत की, “बायबलांत कितीहि अविचारी आणि सारासार विचारविरुद्ध मजकूर असला, तरी तुम्ही स्थावर विश्वास ठेवलाच पाहिजे. त्यात लिहिलेले देवी चमत्कार कितीहि असंभाव्य आणि अशक्य वाटत असेल, तरी त्यांच्या विरुद्ध तुम्ही सुद्धा काढता कामा नये, त्यांच्यावर तुमची श्रद्धा विश्वास तुम्ही ठेवलाच पाहिजे. बायबल स्मृतीचे व्यवहारीक नियम कितीहि असंबद्ध आणि निष्ठुर असले तरी ते तुम्ही डोळे झाकून बिनतक्रार मान्य केलेच पाहिजेत. तुम्हाला बायबल वाचण्याची जरूर नाही, आम्ही तें तुमच्या करितां या में तुम्हाला मुळींच समजणार नाही, कारण ते ईश्वरदत्त आणि साक्षात्कारी आहे; आणि साक्षात्काराचे जन्मसिद्ध ज्ञानी आम्ही पोप आणि पाद्रीजन आहोत. तुमच्यासाठी ते आम्ही वाचीत जाऊं आणि आम्ही जे सांगू त्यावर तुम्ही अगदी डोळे मिटून विश्वास ठेवणें प्राप्त आहे. हे असे का आणि तें तसे का ? हे विचारण्याचा तुम्हांला अधिकारच नाहीं, याद राखून ठेवा
नरकखान्याच्या किल्ल्या आमच्या हाती
आहेत. आम्हां पूज्य आणि पवित्र पाद्री पोपांना किंचित विरोध करताक्षणीच तुम्हाला ईश्वराच्या नरकखान्यांत चिरकाल फेंकून देण्याचे सामर्थ्य आमच्या हातात आहे.” पोप पाद्र्यांच्या या बरळण्यांत आणि आमच्या आधुनीक नामधारी ब्राह्मणांच्या पुराणोक्त आत्मवर्चस्वांत काडीचाहि फरक नाहीं. पाद्रीपोपांच्या इतकाच या ब्राह्मणकांनी हिंदी जनतेच्या सदसद्विवेक बुद्धीचा खून करून त्यांना लुळेपांगळे बनविण्याचे घोर महापातक केलेले आहे निरनिराळी तऱ्हेतऱ्हेची पुराणें लिहून, त्यांत आपल्या जातीच्या अनुलंध्य वर्चस्वाची खोटींनाटी वर्णने घुसडून, त्यांनी ब्राह्मणेतरांची सत्यान्वेषण दृष्टी फोडून टाकण्यात पोपपाद्र्याच्या क्रौर्यावरहि सरशी केलेली आहे.
पोप पाद्र्यांच्या या बरळण्यांत आणि आमच्या आधुनीक नामधारी ब्राह्मणांच्या पुराणोक्त आत्मवर्चस्वांत काडीचाहि फरक नाहीं. पाद्रीपोपांच्या इतकाच या ब्राह्मणकांनी हिंदी जनतेच्या सदसद्विवेक बुद्धीचा खून करून त्यांना लुळेपांगळे बनविण्याचे घोर महापातक केलेले आहे निरनिराळी तऱ्हेतऱ्हेची पुराणें लिहून, त्यांत आपल्या जातीच्या अनुलंध्य वर्चस्वाची खोटींनाटी वर्णने घुसडून, त्यांनी ब्राह्मणेतरांची सत्यान्वेषण दृष्टी फोडून टाकण्यात पोपपाद्र्याच्या क्रौर्यावरहि सरशी केलेली आहे. क्रिस्ती भटांप्रमाणे या हिंदू भटांचेहि वर्म
श्रद्धावान् लभ्यते ज्ञानम्
या महावाक्यांत आहे. लोकांत अंधश्रद्धा शक्य तितकी प्रसार करून करूनच ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना बौद्धिक गुलाम बनविलें आहे. याचा परिणाम साहजीकच असा झाला की सत्यशोधनप्रवृत्ती नष्ट होऊन तिच्या जागी धर्मभोळेपणा आणि अंधश्रद्धा यांचे भयंकर प्राबल्य माजून सारी जनता ईश्वराला धाब्यावर बसवून त्याच्या जागी भटाभिक्षुकांची पूजा अर्चा करू लागली, ‘एको देवः’ चे तेहतीस कोटी देव बनून दररोज त्यांत आणखीहि नव्यानव्या देवाची भर पडत आहे. नाना प्रकारची व्रते व नवीन नवीन देवतांचे बंड यांची गर्दी रोज होतच आहे. फार काय, पण काही विशेष क्षेत्रांत कामगिरी करणाऱ्या लोकांची त्यांच्या हयातीतच देवळें बांधण्याची सुरुवात ब्राह्मणांनी आता केली आहे. भोळसटपणा आणि अंधविश्वास या दोन जालीम विषाचे डोसांवर डोस पाजून ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना नामर्द, आंधळे, मुके आणि पांगळे करून सोडले आहेत. शिमग्यातील बीभत्सपणाच्याहि तोंडांत मारणारी बारा ज्योतिर्लिंगांच्या उत्पत्तीची पौराणिक वर्णन ऐकून किंवा वाचून त्यांतल्या गलिच्छ प्रकरणांबद्दल पुराणिक पोपटाला उलट सवाल करण्याची आजपर्यंत एकाचीहि छाती झाली नाहीं, याचे कारण काय? भटजीनें पुराण वाचून मोठ्या आवेशाने प्रतिपादन करावें की विश्वामित्राने सहस्त्रवर्षे लोहपिष्ट भक्षण करून मोठ्या माराकुटीनें ब्राह्मणपणा प्राप्त करून घेतला आणि अखेर जेहत्ते निर्णय सांगितला की
धिग्बलं शात्रबलं ब्राह्मणबलं बलम्
आणि आम्ही वाहवा वाहवा ! काय या ब्राह्मण्याची थोरवी हो ! म्हणून नंदी बैलाप्रमाणे माना हालवाव्या! पण या भिक्षुकी कादंबरीत उघडउघड दिसणाऱ्या असंभाव्यपणावर सुद्धा शंका घेऊ नये, हें नामर्द आणि कमजोर बनलेल्या बुद्धीचें लक्षण नव्हे काय? विश्वामित्रानें त्रिशंकू राजाला एखाद्या चिरुटाप्रमाणे स्वर्गात झुगारून द्यावें. वशिष्टाने त्याला फुटबॉलप्रमाणे खाली ढकलून द्यावें, विश्वामित्राने आणखी एकदां त्याला टांच मारून वर फेंकावें, आणि त्रिशंकूनें मध्यंतरींच खाली डोके वर पाय करून लोंबळकत राहवें, ही गोष्ट घडली तरी कशी? याचा विचारच कोणी करित नाही. मग या गोष्टीतील अंतरंगाची छाननी कोणी करावी? धर्मराजाच्या खापरपणज्या नहुषानें
ब्राह्मणांना गाडी ओढायला लावले
म्हणून तो ब्राह्मणांच्या शापाने सर्प होऊन रानोमाळ भटकूं लागला ब्राह्मण परशुरामानें एक नाहीं दोन नाहीं एकवीस वेळा निःक्षत्रिय पृथ्वी केली ; ब्राह्मण वामनानें तीन पावलांत सारी पृथ्वी आक्रमण करून चवथ्या पावलाच्या कचक्यानें क्षत्रिय बलीराजाला पाताळांत चिणले. इत्यादी गोष्टी वाचून किंवा एकून त्यांच्या खरेखोटेपणाबद्दल शंका काढण्याचे धारिष्ट कोणाला होत नाहीं, मग या गोष्टी कोणी वा का अस्तित्वात आणल्या याची विचारपूस करण्याची जरूरच काय?
भट्ट सांगे आणि मठ्ठ ऐके!
अशी जी परावलंबी व परप्रत्ययनेय स्थिति आज बहुजनसमाजाला प्राप्त झाली आहे. तिचें कारण काय? जशी आज सर्वांची खात्री पटली आहे की क्रिश्चन धर्माचा पांढरा पाय जिकडे जिकडे फिरला तिकडे तिकडे त्याच्या मागोमागच गुलामगिरीचा खराटाहि फिरला, त्याचप्रमाणे जेव्हापासून भिक्षुकी मताच्या वर्चस्वाचा श्रुतिस्मृतिपुराणोक्त वरंवटा हिंदू लोकांच्या टाळक्यांवर फिरूं लागला. तेव्हांपासूनच हिंदुचें विचारस्वातंत्र्य मरण पावलें, त्यांचा राष्ट्रीय दर्जा सुतकीं बसला आणि त्यांच्या सदसद्विवेक बुद्धीला वैधव्य आल्यामुळे तिचे केशवपन झाले.
अशा परिस्थितीत नाना तऱ्हेच्या देवी अकल्प्य चमत्कारांच्या सुळसुळाटांनी बिछान्यांतील ढेकणांप्रमाणे आमचे स्मृति पुराणादि ग्रंथ गजबजून गेले तर त्यांत काय नवल? अहिल्येची म्हणे शिळा झाली. आणि शिळेची पुन्हा अहिल्या झाली. मुसळ गेलें होतें तें तैसेंच राहिलें तेथे समुद्रावर म्हणें पाषाण तरले. या जुन्या पुराण्या गोष्टी राहूं द्या; परंतु आमच्या संतलीलामृतांत तुम्हांला असा एकहि संत आढळून यायचा नाहीं कीं ज्यानें निदान एक डझनभर तरी चमत्कार केले नाहींत. अगदी विद्यमान् नारायणबोवा केडगांवकरादि प्राणी घेतले तरी त्यांच्याहि देवी जामानिम्याच्या आमटीत काही ना काही तरी चमत्कारांच्या मीठमोहरीची फोडणी पडलेली आढळते. जो खरा सत्यशोधक असतो, तो जुन्या गोष्टी जुन्या म्हणून निवळ अंधभक्तीनें मान्य करणार नाहीं किंवा नव्या गोष्टी नवीने म्हणून त्यांचा त्याग करणार नाहीं. विवेकबुद्धीची खात्री पटल्याशिवाय कोणतीहि गोष्ट निवळ अंधश्रद्धेने मान्य करणे ही गुलामांची प्रकृति असते. डॉ. ए. थॉम्सन म्हणतात "ही गुलामगिरीची प्रकृति म्हणजे सत्याला फुस लावून त्याचा खून करून त्याला मातीत गाडणारी असते." एखाद्या होतकरू तरुणाला सोळा विद्या आणि चौसष्ट कलांत तरबेज करून, त्याच वेळी त्याला मुष्टीमैथुनाची द्वाड खोडहि जर शिकवली, तर त्याचें कल्याण केलें असें कोणीहि म्हणणार नाहीं. त्याचप्रमाणे जनतेच्या चिकित्सक स्वतंत्र विचारवृत्तीचा खून करणारी अंधश्रद्धा त्यांच्यांत फैलावणे यालाहि कोणी शहाणा चांगलें म्हणणार नाहीं. आम्हीं बोलूं ती वेदवाणी वाचूं तो धर्मग्रंथ, सांगू ती स्मृति, अशा दमदाटीच्या प्रयत्नांबरोबरच जनतेंत अंधविश्वास उत्पन्न करणे, त्यांच्या सारासारबुद्धीच्या विकासाचे क्षेत्र शक्य तितके संकुचित करणे, त्यांच्या धर्मकर्मांच्या मर्यादा आंखडत्या धरून आमका अधिकार तुम्हांला आहे आणि तमका नाही असल्या अनुज्ञांची त्यांच्यावर बळजबरी करणे, म्हणजे मानवी समाजाला पुच्छविहीन पशू बनविणें होय. ब्राह्मणांनीं ब्राह्मणेतरांचे काय नुकसान केलें तें दाखवा म्हणून पृच्छा करणाऱ्या
पुण्याच्या केसरीकंपूला जबाब
हाच की त्यांनी ब्राह्मणेतरांना खोट्यानाट्या अधार्मिक कल्पनांनी गेल्या दोन हजार वर्षे आचार व विचारस्वातंत्र्यापासून भ्रष्ट केलें आहे. अर्थात् स्वातंत्र्यप्रिय हिंदू आर्यांच्या प्राचीन राष्ट्रांत ही बौद्धीक गुलामगिरी नव्यानेंच सुरु करण्याच्या अघोरी पातकांबद्दल ब्राह्मणांना पूर्ण प्रायश्चित दिल्याशिवाय ब्राह्मणेतर केव्हांहि स्वस्थ बसणार नाहींत.
प्रकरण २
भट-बायबल-मोक्ष
(५) सध्या हिंदी आर्याच्या प्राचीन इतिहासाचे पुनरुज्जीवन होऊ पहात आहे. राजकीय स्वातंत्र्याचा उष:काल झाला आहे. लोकसत्तेचा गार वारा पारतंत्र्याने होरपळलेल्या अंतःकरणाच्या वेदना हळुहळु शमवीत आहे. तथापि एका इंग्रजी तत्ववेत्त्यानें म्हटलें आहे. की:--
Political rights, however broadly framed, Will not elevate a people individually depraved.
म्हणजे, राजकीय क्षेत्रांतील हक्क कितीहि उदात्त आणि व्यापक धोरणांवर आंखलेले असोत, ज्या समाजांतील व्यक्ती न व्यक्ती गुणभ्रष्ट बनलेली असते. त्या समाजाच्या उन्नतीला त्या हक्कांचा काडीमात्र उपयोग होत नाहीं. ब्राह्मणांनी ब्राह्मणेतरांना गुणभ्रष्ट करण्यांत कसकसे अत्याचारी प्रयोग अंमलात आणले. हे पाहू इच्छिणारांनी
मनुस्मृतीचा नीट अभ्यास करावा.
मनुस्मृति हें राष्ट्राचा जीव हळूहळु घेणारे एक जालीम भिक्षुकी जहर आहे. वरुन शर्करावगुंठीत असल्यामुळे कोणीहि ते निमूटमणे गिळतो. भिक्षुकशाहीच्या अरेरावी वर्णाश्रम (अ) धर्माची कायदेबाजी दाखविणारा ग्रंथ हाच. या भिक्षुकी बायबलांत ब्राह्मणांची अवास्तव आणि आटोकाट स्तुति करून ब्राह्मण्याची तळी आकाशापेक्षा उंच उचलून धरण्यांत आलेली असल्यामुळे, सोटा हे जरा काबुली पठाणाचे दैवत त्याप्रमाणे मनुस्मृति हा ब्राह्मणांचा एक दैवतग्रंथ होऊन बसला आहे. शिवाय या ग्रंथाच्या नांवाला मनूच्या नावाचे एंजीन जोडलें गेल्यामुळे तर त्याच्या महतीची टिमकी ब्राह्मणांनी अतोनात पिटली. जनता अंधश्रद्धेनें बौद्धिक गुलामगिरीत जखडलेली, ब्राह्मणेतरांनी व विशेषतः ब्राह्मणाशी तोडीस तोड देणाऱ्या क्षत्रियांनी विद्येचा व ज्ञानाचा हव्यास सोडलेला आणि न्यायनिष्ठुर ऐतिहासिक चिकित्सेचा पूर्ण अभाव, अशा परिस्थितीचा फायदा घेऊन ब्राह्मण ब्युरॉक्रसीने एकदम मनुस्मृतीच्या महिम्याचा चोहीकडून जनतेवर भयंकर हल्ला चढविल्यामुळे, आजलाहि या ग्रंथाच्या फाजील स्तोमाबद्दल कांही भलभलते ग्रह लोकांच्या कल्पनेत मूलभूत झालेले पहाण्यांत येतात.
जे कोणी विद्वान आहेत, वाचन मनन निदिध्यास करणारे आहेत, चिकित्सक वाङमयाशी परिचित आहेत, त्यांना ही मनुस्मृतीची पोकळ हंडी चांगली परिचालेली आहे. परंतु असले सुशिक्षित लोक हिंदुस्थानासारख्या तीस तेहतीस कोटी लोकसंख्येंत केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असल्यामुळे बहुजनसमाजावरील मनुस्मृतीच्या वीरमंत्राचा अंमल अजुनसुद्धा आहे तसाच कायम आहे. कोणत्याहि आत्मविश्वासू, स्वावलंबनी आणि अतुल पराक्रमी राष्ट्राला गुपचूप हतबल करून त्याच्या पायांत गुलामगिरीच्या अभेद्य श्रृंखळा ठोंकावयाच्या असतील, तर त्याला नित्य मनुस्मृतीचे डोस ढोंसण्यास द्यावे; हटकून ते राष्ट्र नामर्द परावलंबी आणि पतित झाल्याशिवाय राहणार नाहीं. त्याची सत्यशोधनाची भूक ठार मरून, त्याला अंधश्रद्धेचें अग्निमांद्य लागेल. स्वर्ग आणि नरक या दोन पात्यांच्या कात्रीत त्यांची मान अडकल्यामुळे, ज्यांच्या हातांत कात्री त्यांनी आपल्या निर्विवाद वर्चस्वाची नितांत खात्री ठेवावी. गुणभ्रष्टता ही गुलामगिरीची गुरुकिल्ली आहे. राष्ट्र गुणभ्रष्ट झाल्याशिवाय तें गुलाम बनत नाही. म्हणून जेते लोक जित लोकांना निःशस्त्र करून प्रथम त्यांना गुणभ्रष्ट करण्याची खटपट करतात. यानेंहि काम भागलें नाही तर याच्यापुढची निर्विद्यतेची युक्ति अंमलात आणतात. राष्ट्र निर्विद्य की मग त्याला निर्वेध पिळून काढण्याचे काम अत्यंत सुकर होतें.
ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या तोंडांतून पडले
असल्यामुळे त्याना या युक्त्या जन्मसिद्धच अवगत होत्या. त्यांनी सर्व ब्राह्मणेतरांना आस्ते आस्ते मनुस्मृति पुराणादि काढ्यांची सप्तके पाजून पाजून त्यांना पूर्ण निर्विद्द अथवा बौद्धिक गुलाम बनविले आणि आपल्या वर्चस्वाचे टोलेजंग मनोरे सर्व हिंदुस्थानांत उभारले. तार्तर मोंगलांच्या अगणित स्वाऱ्यांनी, इस्लामियांच्या कडव्या तलवारींनी किंवा इंग्रेजांच्या हत्यारांच्या कायद्यांनी हिंदी राष्ट्राची मर्दुमकी जितका खच्ची झाली, त्यापेक्षां सहस्त्रपट नपुंसकपणा ब्राह्मणांनी त्याला निर्विद्य ठेवून आणला, हें इतिहास छातीला हात लावून सांगत आहे. वैदिक किंवा उपनिषत्कालांतली हिंदु धर्माची व्यापक प्रवृत्ति पुढें पुढें संकुचित होत गेली आणि सामाजिक क्षेत्रांत एकट्या ब्राह्मणांशिवाय इतर सारे वर्ग निर्माल्यवत् कसे झाले. याचे धागेदोरे ब्राह्मणांनी सर्वत्र पसरविलेल्या बौद्धिक गुलामगिरीच्या जाळ्यांत सांपडतात. परंतु
चिंती परा आणि येई घरा
या सुप्रसिद्ध लौकिकी म्हणीप्रमाणे ब्राह्मणहि याच स्वकृत बौद्धिक गुलामगिरीच्या जाळ्यांत सांपडून अखेर इतर वर्गाप्रमाणेच नामधारी कसे बनले, हें अर्वाचीन काळच्या इतिहासावरून स्पष्ट दिसून येते. चातुर्वर्ण्याच्या मर्यादा शक्य तितक्या कडक व सीलबंद करून ब्राह्मणेतरांना गुणभ्रष्ट बनविण्याच्या ‘राष्ट्रीय’ घाण्यांत अखेर ब्राह्मणांचाहि बळी पडल्यामुळे आजला ब्राह्मणवर्ग अजीबात नष्ट झाला आहे. इतरांना गुलाम करणारे अखेर आपण स्वतःच कसे नकळत गुलाम बनतात, हें ब्राह्मणांच्या निर्मूलनाच्या इतिहासावरून खास शिकता येण्यासारखे आहे. मागें कांही वर्षांपूर्वी ‘आर्यधर्म’ नामक मासिक पुस्तकांत एक मनोरंजक संवाद आला होता. त्याला येथे आम्ही नमूद करतो त्यावरून सध्यांच्या नामधारी ब्राह्मण्याचा डोलारा किती पोकळ आहे ते वाचकांना समजून येईल :--
सिद्धांत :-जो विद्वान् नाहीं व ज्यांच्यांत ब्राह्मणत्व नाही, अशाला कोणीहि ब्राह्मण म्हणू नये. व त्यांची सेवाही कोणी करू नये.
प्रश्न :- मग हे जे सध्या ब्राह्मण म्हणवितात ते कोण ?
उत्तर :- ते ब्राह्मण नव्हत. ते भिक्षुक -भिक्षेकरी आहेत. जसे युरोपात पोप, तसे हे येथे अधर्म भाजविणारे स्वार्थी लोक..... ..पूर्वीचे ब्राह्मण खरे होते व आतो हे नामधारी झाले आहेत.
प्रश्न :-सध्यांचे ब्राह्मण नामधारी कसे ? यांचा पिता व मातांहि ब्राह्मणी. असे असता त्यांच्या संतानाला नामधारी ब्राह्मण असे कसें तुम्ही म्हणता ?
उत्तर :- तुम्ही म्हणतां तें खरें पण विचार करा की आईबाप ब्राह्मण असले किंवा गुरु चांगला साधू असला, तथापि त्यांची मुले किंवा शिष्य उत्तम ब्राह्मण किंवा उत्तम साधू असतातच, असा काही नियम नाही. ब्राह्मण किंवा साधू आपापल्या अंगच्या गुण कर्मस्वभावाप्रमाणे होत असतात. जर आंगी ब्राह्मणाचे गुण नाहीत, तर ब्राह्मण्य तरी आहे असें कसें म्हणता येईल? ब्राह्मण परोपकारी असले पाहिजेत. पण सध्यांचे हे नामधारी ब्राह्मण स्वार्थी व म्हणूनच दान घेण्यांत पटाईत आहेत. युरोपातल्या पोपाप्रमाणे यांची सध्याची स्थिति आहे.जे भोंदू आहेत ते जरी ब्राह्मणांच्या कुळामध्ये उत्पन्न झालेले असले तरी ते ब्राह्मण नव्हत असें धर्माच्या साक्षीने आम्ही साफ म्हणतो.......राजे यजमान व इतर लोक हे सर्व अविद्वान् झाल्यानंतर काही मंत्रांची घोकंपट्टी करणारेच ढड्ढाचार्य बनले त्यांनी “ब्राह्मणो न हन्तव्यः । साधुर्न हन्तव्यः” ही वाक्यें पुढे करून नामधारी ब्राह्मण व वेषधारी भोंदू यानी कोणतिहि पातकें केली तरी ते अवध्य आहेत, असे भासविलें तर त्यांत नवल काय? या स्वार्थसाधू लोकांनीं पाहिजे तसे ग्रंथ लिहून शेवटी व्यासाचें नाव किंवा दुसऱ्या कोणत्यातरी ऋषिमुनींचे नांव घालून आपल्या मतलबाचा प्रचार केलेला आहे.
* * * *
[६] ब्राह्मणांच्या षट्कर्मापैकी सध्या जर कोणते कर्म अबाधित जिवंत राहिले असेल तर तें ‘दान घेणें’ अथवा परिग्रह हे होय. पूर्वी ब्रह्म जाणणारा ज्ञानप्रसारक तो ब्रह्मण ही ब्राह्मण्याची व्याख्या होती आता सामाजिक धार्मिक कांहीहि काम न करता उनाड पोळाप्रमाणे भीक: मागणारा तो ब्राह्मण, ही व्याख्या प्रचलीत आहे. जणू काय भीक मागणें हेंच अलिकडच्या ब्राह्मणाचे मुख्य लक्षण होऊन बसले आहे. गेल्या दोन हजार वर्षातले धार्मिक ग्रंथ पाहिले तर आत्मज्ञानाच्या विवरणापेक्षा दानकर्माच्या निरनिराळ्या पद्धतींचा उहापोह करण्याकडेच त्यांचा कल विषेश दिसून येतो. मनु याज्ञवल्क्य पराशर यांच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या स्मृत्यांचे कोणतेंहि पातडें घ्या, त्यांत या दानांचाच सुळसुळाट मनस्वी भरलेला आहे. शिवाय या दानपद्धतीच्या ट्रेडमार्काला गुणकर्मविशिष्ठत्याची नक्षीदार बॉर्डर पाहिजेच असा खुद मनुस्मृतीचाहि आग्रह नसल्यामुळे दान घेणारा ऊर्फ भीक मागणारा साहजीकच ब्राह्मण्याचा अधिकारी ठरतो. भीक मागणाऱ्या भिक्षुक भटाला कोणकोणत्या प्रसंगी किती किती दक्षिणा दिली पाहिजे, याचेंच विवेचन करण्याकडे गेल्या दोन हजार वर्षातील ब्राह्मणी ग्रंथांनी जितकीं पृष्ठे खर्ची घातली आहेत, त्याच्या निमपट पृष्ठे आणि पावपट श्रम जर ब्राह्मणांनी ब्रह्मज्ञानशोधनांत व अध्ययनांत खर्ची घातली असती तर आजला ब्राह्मण्याच्या नामाभिधानाखाली शूद्रातिशूद्र प्राणी मिरवतांना खास दिसले नसते. बरें, बाह्मणांना दक्षिणा द्यायची ती देखील थोडीथोडकी देता कामा नये. बौद्धिक गुलामगिरीचे आधपुरस्कर्ते मनुस्मृतिकार म्हणतात:--
इन्द्रियाणि यशः स्वर्गमायुः कीर्ति प्रजाः पशून् । हन्त्यल्प दक्षिणो यज्ञस्तरमान्नाल्पधनो यजेत् ।। ११.४०
अर्थ :- ज्यामध्ये अल्प दक्षिणा दिली आहे असा यज्ञ यजमानांची चक्षुः श्रोत इत्यादि इंद्रियें. यश, स्वर्ग, आयुष्य, मेल्यावर मार्गे राहणारी कीर्ति, अपत्ये व पशू यांचा नाश करतो, यास्तव अल्प दक्षिणा देऊन यज्ञ करूं नये.
इतकेंच नव्हें तर, दक्षिणा तांब्या रुप्याची किंवा निकल चामड्याची चालणार नाहीं. ती सोन्याचीच पाहिजे. चांदीची किंवा इतर दक्षिणा निषिद्ध मानली आहे. का? त्याच्याहि आधाराची कादंबरी आगाऊच ब्राह्मणीग्रंथांत घुसडून ठेवलेली आहे. अग्नीजवळ देवांनी आपली मालमत्ता ‘डिपाझीट’ ठेवली होती. ती जेव्हां त्यांनी परत मागितली, तेव्हां साहजीकच
अग्नीच्या पोटांत भडभडून आलें.
तो ओकसाबोक्शी रडूं लागला. तेव्हा त्याच्या डोळयांतून जी टिपें टपटपां गळली ती चांदी झाली; म्हणून जो कोणी चांदीची दक्षिणा ब्राह्मणांना देईल त्याच्या घरात नेहमीं रडारड होईल. (`हिंदुस्थानांत अलीकडे प्रत्येक घरांत या नाहीं त्या रोगानें माणसें मरून जी सर्वत्र रडारड सुरू आहे, याचें कारण लोक ब्राह्मणांना सुवर्ण दक्षिणा देत नाहींत. हेंच असावें असें वाटतें. ही रडारड बंद व्हावी अशी इच्छा असणाऱ्या कर्मयोगी, दे. भ. महात्म्यांनी स्वराज्य प्राप्तीची उठाठेव कांही काळ बंद ठेऊन ब्राह्मणांना कचकावून सुवर्णदक्षिणा देण्याची राष्ट्रीय चळवळ सुरू करावी अशी शिफारस आहे..) अशा प्रकारचे नाटकी निर्बंध करण्यांतला ब्राह्मणांचा मुख्य हेतू काय होता हे आताच आठ वर्षांचे शेंबडें पोरसुद्धा सांगू शकेल, या भीकमाग्या दानपद्धतीमुळे ब्राह्मणांच्या पोटापाण्याचा प्रश्न सनदशीर सुटला अर्थात् त्याच्याबरोबरच त्यांच्या कर्तव्यकर्माच्या जबाबदारीचा बोजा अज्जीबात उठला. पण या दानपद्धतीनें राष्ट्राची दोन भयंकर नुकसानें झाली.
एक :- ब्राह्मणांवर कोणाचा दाब न राहिल्यामुळे त्यांनी धर्माचा आणि तत्त्वज्ञानाचा चुथडा केला व जी काही विद्या गुरुशिष-परंपरेने अस्तित्वांत राहिली असती तिचा समूळ नाश झाला. दुसरे :- राष्ट्रात जशी एदी महामूर्ख भिक्षुक टोणप्यांचा अतोनात सुळसुळाट झाला. राष्ट्रांत जोपर्यंत सुबत्ता होती, तोपर्यंत मतिमंद बनलेल्या श्रद्धा जनतेने या शुकांच्या झोळीचा कधीहि अनादर केला नाही, पण दानपद्धतीच्या मंत्राचा अंमल किंचित उतरत आहे असे त्यांच्या नजरेस येताच, त्यांनी तीर्थमहात्म्यें व नानाप्रकारची व्रतवैकल्ये याचा सुळसुळाट करून सोडला. याच सुमारास
पुराणांचा अवतार झाला.
समुद्रांत प्रवास करणारा मनुष्य जसा संकट प्राप्त होतांच बोटीवरील लाईफ बोय् प्राणसंरक्षक पट्ट्याकडे धावत जातो, तसे हे नामधारी ब्राह्मण आपल्या फोलकट ब्राह्मण्यावर हल्ला होतांच पुराणांची कांस धरतात. डोंबाऱ्याच्या पोतडीप्रमाणे पुराणात सर्व कांहीं बिनचूक सांपडते. सृष्टी उत्पन्न कशी झाली. सूर्यवंशी सोमवंशी राजांच्या वंशावळी, ठिकठिकाणची तीर्थे व त्यांची महात्म्ये, अद्भुत चमत्कारांची रेळचेळ, पाताळ स्वर्गाची वर्णने पुढील भविष्ये, पवित्र अपवित्र दिवसांच्या याद्या, व्रतवैकल्यांच्या पापपुण्याच्या जंत्र्या, वर्णाश्रम धर्माच्या कथा, श्राद्ध पिंडांची वर्णनें, मोठमोठ्या यज्ञांची वर्णने, नवखंड पृथ्वीचा भूगोल. काय वाटेल तें पुराणांत आहे. परंतु इतिहासाच्या भूगोलाच्या शास्त्राच्या किंवा सारासार विचाराच्या कसोटीस त्यांतली एक गोष्ट उतरेल तर हराम ! अथपासून इतिपर्यंत ब्राह्मणांचे स्तोम ! कै. लोकहितवादी म्हणतात. " पुराणांच्या स्वार्थी म्हणावयाचें कारण, त्यांत सर्वत्र फक्त ब्राह्मण जातीचें मात्र अघळपघळ वर्णन, त्यांचे शाप उःशाप, सामर्थ्य, तप वगैरे भरून दिले आहे. हा प्रकार पाहिला म्हणजे तेव्हांच ही स्वार्थसाधुता व्यक्त होते. गुणकर्मविभागा करून ब्राह्मण्याच्या स्थापनाची गोष्ट अगदी लयास जाऊन ब्राह्मणवंश पिढ्यानुपिढ्या कायम राहू लागले. त्यामुळे उच्च व कुलीन मानलेला जो ब्राह्मणवर्ग त्यास लवकरच कमीपणा घेऊन शेवटी इतक्या थरावर गोष्ट येऊन ठेपली कीं.
ब्राह्मण ह्मणजे पहिल्या प्रतीचे घातुक
दुष्ट बुद्धीचे आणि कृतकर्म आहेत, अशी सर्वांची समजूत व्हावयास लागली. दुराचरण नाहीं कोठें? गांव आहे तेथे महारवाडा आहेच; परंतु असें असून सर्व प्रकारची उच्चता ब्राह्मणांकडे आलेली जेथें वर्णिली आहे. येणेकरून परजातीयांस ब्राह्मणांचा हेवा उत्पन्न होऊन ते त्यांचें पैशून्य पाहतात. है साहजीक व योग्य आहे. गुणकर्मे करून चतुवर्ण वर्गीकरण करण्याचीच रीति सुरू असती म्हणजे असे हेव्यादाव्याचे कारण राहिलें नसती असे वाटतें. पुराणातील कथांतून ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व किती वर्णिलें आहे? याची उदाहरणें म्हणजे सर्व पुराणेंच आहेत. याचा शब्द देवहि कधिं खाली पडू देत नसत व क्षत्रिय राजे तर त्यांस चळचळ कांपत असत. इत्यादि वर्णने जागोजाग आढळतात. विश्वामित्रानें हरिश्चंद्राचा छळ केला दुर्वासानें धर्मराजास अरण्यवासांत असतां अन्नाकरिता आडविले, परिक्षितीस शृंगीनामक ऋषिपुत्राने शापिले, भृगु ऋषीने श्रीविष्णूच्या उरस्थलावर लत्ताप्रहार केला, इत्यादि कथा वर्णून त्या त्या सर्वांकडून त्या ब्राह्मणांचा मोठा सन्मान झाला असे लिहिलें आहे. ब्राह्मण म्हणजे शापादपिशरादपि जें बोलतील तें होईल, करितां त्यांचे म्हणणें कोणीहि अमान्य करू नये, असे ठिकठिकाणी शेरे देऊन त्यांच्या हुबेहूब उदाहरणांचे दाखले नमूद करून ठेविले आहेत :-
(अहाहा ! केवढी उज्ज्वल ही वेदवाणी ! कोणीतरी रिकामटेकड्या ब्राह्मणपुत्रानें ही असली दिव्य वचनें एकत्र जमवून ‘ब्राह्मणतेजमहात्म्य’ नावाचा एक राष्ट्रीय ग्रंथ सर्व भाषांत तयार करावा. म्हणजे आपत्प्रसंगीं, राजद्रोहाच्या खटल्यांत पुरावा म्हणून तो दाखल होतांच कोर्टातला न्यायाधीश व पार्लमेंटांतले जूरर्स, ह्या ग्रंथाच्या प्रभावाने आणि ब्राह्मणांच्या जन्मसिद्ध तेजानें ठिकच्या ठिकाणी जळून खाक होतील.)
* (१) देवाऽधीनं जगत्सर्व मंत्राऽधीनं च दैवतम् ! ते मंत्रा ब्राह्मणाऽधीना ब्राह्मणो मम दैवतम् !!
भागवत.
(१) सर्व जग देवाच्या स्वाधीन, देव मंत्रांच्या आधीन मंत्र ब्राह्मणांच्या स्वाधीन म्हणून ब्राह्मण जेहत्ते दैवतच होत.
(२) अविद्वांश्चैव विद्वांश्च ब्राह्मणो दैवतं महत् ! प्रणीतश्चाऽप्रणीतश्च यथाऽग्निदैवतं महत् !! मनु. ३१७-९.
(२) ज्याप्रमाणे अग्निहोत्राच्या कुडांत सिद्ध करून ठेवलेला अग्नि असो की ज्यावांचून दुसरा अग्नि असो ती मोठी देवता आहे, त्याप्रमाणे ब्राह्मण विद्वान असो की अविद्वान असो ते दैवत आहे.
(३) पृथिव्यां यानि तीर्थानि तानि सर्वाणि सागरे । सागरे सर्व तीर्थानि पदे विप्रस्य दक्षिणे ॥
(३) पृथ्वीवरील सर्व तीर्थाचें श्रेय सागरांत असतें आणि ब्राह्मणाच्या उजव्या पायांत(डाव्या नव्हे हो !) सर्व सागराचे पुण्य सांठविलेलें असतें.
(४) दुःशीलोऽपि द्विजः पूज्यो न तु शूद्रो जितेंद्रियः । कः परित्यज्य गां दुष्टां दुहेच्छीलवती खरीम् ॥ पराशरः ३३-८
(४) ब्राह्मण कितीहि दुर्वर्तनी असला तरी तो पूजनीय व वंद्यच होय; परंतु शूद्र जितेन्द्रीय झाला तरी तो कदापिहि पूजनीय होऊ शकत नाही. अहो ! गाई कितीहि दृष्ट व खोडकर असली म्हणून शहाणा मनुष्य कधिं चांगल्या सुशील गधडीचें का कधीं दूध काढण्यास प्रवृत्त होईल ? कदापि नाहीं !"
पुराणांतल्या राजांच्या वंशावळी आणि त्यांच्या भरंवसाट दिलेल्या आयुष्यमर्यादा म्हणजे पुराणकारांच्या अक्कलशून्य मेंदूची दिव्य प्रदर्शनेंच म्हटली पाहिजेत. पुराणांतला भूगोल घेऊन पृथ्वीपर्यटणास निघणाऱ्या प्राण्याचे डोकें ताळ्यावर असल्याचे खुद्द पुराणकाली तरी कोणी शहाण्याने सर्टिफिकीट दिलं असेल, असें आम्हांस वाटत नाहीं. पुराणांतला भूगोल ज्योतिषशास्त्राच्या कसोटीस लावतांच, तो मिथ्या आणि खोडसाळ ठरवून खुद्द भास्कराचार्यादि विद्वान ज्योतिषी त्यावर छी छी करून धुकले बरे, काव्य या दृष्टीने जरी पुराणे पाहिली तरीहि ती कवडीमोल आहेत कल्पनातरंगाच्या भरारीला तरी कांहीं सीमा? कोणी समुद्र प्राशन केले, पृथ्वी गाईचे रूप घेऊन शरण गेली, सागर पर्वतांना वाचा फुटली, पर्वत उड्डाण करू लागले, पुत्र झाले. चंद्रसूर्याचे यश पृथ्वीवर आले. पृथ्वीवर माणसे स्वर्गात जाऊन परत पृथ्वीवर आली.
ब्राह्मणांच्या वशिल्याचीं माणसें
स्वर्गोत सुखरूप जात आणि बाकीची मात्र पटापट नरकांत गळून पडत ! पुराणादि ब्राह्मणमहात्म्य ग्रंथांत ब्राह्मणांचे जे जे स्तोम ( मूळ पुराणांत क्षत्रियांचा पराक्रमच ग्रंथीत केलेला असे. परंतु मूळच्या खरोष्टी प्राकृत भाषेतल्या पुराणांना ब्राह्मणांनी जेव्हां संस्कृत रूप दिलें तेव्हा त्यांनी क्षत्रियचारित्र्याची पुराणांतून हकालपट्टी करून ब्राह्मणी मतांचा त्यांत बुजबुजाट करून ठेवला. एफ्. ई. पार्जिटर या सुप्रसिद्ध पुराणसंशोधकानें आपल्या Dynasties of Kali Age नामक पुस्तकांत येणेंप्रमाणें खुलासा केला आहे :- It was the brahmans probably who saved and improved the status of those old compositions by converting them into Sanskrit, and afterwards, perceiving what an excellent means they provided for reaching popular thought, made use of them to propagate their own views and doctrines by freely augmenting them with brahmanical fables, philoscphical discusions, and ceremonial expositions which were enforced with the authority of Vyas. I should say therefore speaking generally, that what may be called the Kshatriya, or better perhaps the popular, matter of the puranas constituted the really old and genuine Purana, and that the brahmanical and ritual matters now found in them were later additions and interpolations made from time to time. Int. P. xvii. footnate.) माजविले आहे.
त्याला ज्यांनी बिनशर्त माना वाकविल्या त्यांना त्यांना स्वर्गातील सुखोपभोग चुटकीसरसे प्राप्त झाले आणि ज्यांनी तसे केलें नाही ते रौरव नरकांत अनंत काळ कुझत पडले, अशी काल्पनीक कादंबऱ्यांच्याहि थोबाडीत मारणारी वर्णने ज्या पुराणांत घुसडण्यास ब्राह्मणांनी कमी केले नाही, त्या पुराणाच्या पारायणांनी जनता पापपुण्याच्या आणि स्वर्गनरकाच्या भीतीने गांगरून जाऊन
मोक्षासाठी भटाभिक्षुकांचा कांसोटा
धरण्याइतकी नादान बनली तर त्यांत आश्चर्य काय? लोकहितवादी म्हणतात. [स्वाध्याय पृ० ७७] " जेथें तेथे पुराणांत ब्राह्मणांचे माहात्म्य घातले आहे. ब्राह्मणांची प्रसन्नता सुख देणारी व त्यांचे शाप घात करणारे आहेत. मोठमोठे राजेहि ब्रह्मशापैकरून जळून गेले आणि ब्राह्मणांची प्रसन्नता मिळविणे हीच ईश्वराची प्रसन्नता मिळविण्याचा मार्ग आहे व याजकरितां त्यांस दान यावे असे लिहिले असून त्याप्रमाणे आजपर्यंत उपदेश होत आले. याजमुळे सर्व
धर्माचे धोरण ब्राह्मणभोजनाकडे
गेलें उपयोगी कामांचा उगम थिजून दिवसेंदिवस ब्राह्मणांस वतनदाराचा घुगरी फसकी सारखा फुकट धर्म अविच्छिन्न मिळू लागला आणि त्यामुळे ब्राह्मणांनी आपले कर्म सोडून वैरागी लोक जसे अज्ञानावस्थेत असतात, तसेच ब्राह्मण लोक अज्ञानी झाले. त्यांनी आपले अध्यापनहि सोडलें. व जेणेंकरून निरुपयोगी धर्म मात्र दिवसेंदिवस वृद्धि पावला व भिक्षुक वर्ग वाढला.. सारांशानें पाहिलें असतां पुराणांतील वर्णनक्रमावरून ती केवळ निरपेक्ष बुद्धीनें व लोकांस सद्विचाराचें ज्ञान व्हावें एवढ्याकरिता कर्त्यानें केली नसून, त्यांत ब्राह्मणांचा स्वार्थ दिसतो. `
(७) ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा शब्दसमुच्चय आतां बऱ्याच लोकांच्या परिचयाचा होत आहे. या नवीन चळवळीची कुंडली मांडून तिच्या भविष्याचे ठोकताळे निश्चित ठरविण्यासाठी विचारी लोकांचे विचारयंत्र तिच्या घरांतील ग्रहांचे वैयक्तिक सत्व व तत्व अजमाऊन पहाण्यांत अगदी गुंग झालें आहे. स्वतः स राजकारणाचे गड्डे समजणाऱ्या वावदुकांचे व कलम कसायांचे अड्डे या चळवळीच्या तीव्र वेगाला आपल्या लेखण्या जिव्हांचे कोलदांडे घालून अडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हस्तिदंती धोरणांच्या छांछुने लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकून त्यांच्याकडून आत्मस्तोमाचे देव्हारे थाटविणारी वटवाघुळें म्हणतात की ‘ऐं:! या चळवळींत काही राम नाही. हा नुसता एकमेकांना शिव्या देण्याचा नवीन फोलकट उपक्रम आहे. हा जसा जन्मला आहे तसाच तो आपोआप मरून जाईल. त्याकडे लक्ष देण्याचे कांही कारण नाही. या नवीन चळवळीचा आत्मा कोठें आहे आणि त्याच्या तेजाचे पर्यवसान अखेर कशांत होणार, याची पूर्ण जाणीव कांही समदर्शी सज्जनांना झालेली असून, स्पष्टोक्तीचें धाडस त्यांच्या आंगी नसल्यामुळेच, `बाबांनो, कशाला उगीच एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढून भांडत बसतां? काळाकडे पहा आणि समेट करा. अशा प्रकारचा कोरडा उपदेश करण्यापलीकडें त्यांच्याकडून अधिक कांही होत नाहीं व होणें शक्यहि नाहीं. ब्राम्हण ब्राम्हणेतर चळवळीचा मुख्य कटाक्ष कशावर आहे, हें बिनचुक उमगणारे व स्वतःच त्या कटाक्षाच्या क्षेत्रांत सांपडणारे लोक आपल्या भवितव्यतेबददल जरी पूर्ण साशंक होऊ लागले आहेत, तरी
बुडत्याला गवताची काडी
जशी परब्रह्म वाटते, त्याप्रमाणे त्यांनी या चळवळीच्या पुरस्कर्त्यांवर नानाप्रकारचे गलिच्छ गलिच्छ आरोप करून, तिची भ्रुणहत्त्या करण्यासाठी कंबरा कसल्या आहेत. एरवी, वाटेल त्या बऱ्या वाईट गोष्टांचे बेळगांवी लोणी पुणेरी तत्वज्ञानाच्या कढईत उकळवून त्यांतून निश्चित प्रमेयांचे राष्ट्रीय तूप काढणाऱ्या बृहस्पतींना या ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळीच्या शक्तीचा अंदाज करता येऊ नये, यांत शुद्ध ढोंगापेक्षा आणखी दुसरा कोणताहि मुद्दा नाहीं. न्यायाच्या मंदिरांत बचावाच्या पुराव्याचें भांडे चाटूनपुसून झालें म्हणजे अट्टल आरोपी जसा डोकें बिघडल्याचे किंवा स्मृतिभ्रंश झाल्याचे ढोंग करतो, त्याच मासल्याचा हा ढोंगीपणा आहे.
परंतु, ढोंगाचें सोंग आणलें म्हणून न्यायदेवता ज्याप्रमाणे खुनी इसमाला बेधडक फासावर लटकविल्याखेरीज सोडीत नाहीं, त्याप्रमाणें ब्राम्हण ब्राम्हणोत्तर चळवळीबद्दल गाढ अज्ञान दाखविणाऱ्या शहाण्यासुर्त्या कोंगी, बृहस्पतींना अखेर त्या चळवळीच्या प्रलयाग्नीत भस्मसात् व्हावें लागेल ही धमकी नव्हे, हे सत्य सत्य आहे. ही कादंबरीची गप्प नव्हे, ही इतिहासाची साक्ष आहे. ही पुणेरी हस्तिदंती नव्हे, आत्मविश्वासाच्या तडफेची ही सडेतोड निर्भीड जबानी आहे. अज्ञानी लोकांना पापपुण्याच्या जरबेखाली गुलामापेक्षां गुलाम बनविणाऱ्या भिक्षुकशाहीचा हा बहुरूपी आडपडदा नव्हे; दीन दुनियेला गुलामगिरीतून वर खेंचून काढण्यासाठी तळणाऱ्या हृदयाच्या कळकळीने अस्तन्या वर सारून,
भिक्षुकशाहीला चारी मुंड्या चीत
करणाऱ्या क्षत्रियांचा हा इतिहासप्रसिद्ध कोदण्डाचा टणत्कार आहे. ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळ ही इतिहासाची पुनरावृत्ति आहे. या पुनरावृत्तींत क्षत्रियांच्या हाडीमासी खिळलेली उदार व दिलदार मनोवृत्ति, मागील इतिहासाप्रमाणे प्रतिस्पर्ध्याला चीत करण्याच्या कामी जर फाजील प्रमाणांत आड येणार नसेल, तर हिन्दुस्थान द्वीपकल्पांतून बौद्धिक गुलामगिरीच्या उन्मत्त विषवृक्षाला आमूलाग्र कायमचें उखडून टाकण्याचे अननुभूत श्रेय तिला मिळाल्याशिवाय खास रहाणार नाही. ब्राह्मण-ब्राह्मणेतरांची चळवळ ही फार प्राचीन आहे. तिची सांप्रतची पुनरावृत्ति ही नवीन काळाच्या उदरांतून बाहेर पडलेली
खऱ्या लोकशाहीची तेजस्वी ज्योत
आहे. भिक्षुकशाहीनें आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी प्लेगाच्या किंवा इन्पल्युएन्झाच्या प्राणघातक जंतूंप्रमाणे सर्वत्र फैलावलेल्या बौद्धिक गुलामगिरीचा हा ठेचून काढणारा हा वज्रप्रहार आहे. ज्या गोष्टी मिक्षुकशाहीच्या पुराण-प्रवचनांनी अगर वेदोक्ताच्या कोरड्या अट्टहासांनी साध्य झाल्या नाहींत त्या साध्य व्हाव्या अशी भिक्षुकशाहीनें कधि इच्छाच केली नाहीं ! त्या गोष्टी सांप्रतची ही इतिहासाची पुनरावृत्ति ऊर्फ ब्राह्मणेतरांची चळवळ सिद्ध करून दाखविणार आहे.
भिक्षुकशाही डिमॉक्रसीच्या उर्फ लोकशाहीच्या कितीहि आणि केवढ्याहि लंब्या चौड्या गप्पा मारो, लोकशाहीचें वर्म आणि भिक्षुकशाहीचे मर्म यांचें गोत्र ३६ च्या आंकड्याप्रमाणें आहे. ही गोष्ट सर्वांनी अवश्य विचारात घेतली पाहिजे. पौराणिकी गप्पा झोडून बहुजनसमाजाच्या डोळ्यांत धूळ फेंकण्यांत भिक्षुकशाही फार प्राचीन काळापासून कुप्रसिद्ध आहे. ही गोष्ट त्यांचा वैरी तर नाकबूल करीत नाहीच, पण मित्रसुद्धां नाकबूल करीत नाहीं. पण ज्या ज्या वेळी भिक्षुकशाहीचा वरपगडा होऊन तिच्या हाती सत्तेचा चाप मिळाला. त्या त्या वेळी जनतेच्या मागेला लागलेल्या गुलामगिरीच्या फांसाच्या दोऱ्या ढिल्या करण्यापेक्षा त्या त्या चापाने अधिकाधिक आवळून तिची पूर्ण गळचेपी करण्यापेक्षा आणखी कोणते मोठे शतकृत्य भिक्षुकशाहीनें केलें आहे, त्याचा सप्रमाण दाखला कोणी भिक्षुकशाहीचा शाहीर इतिहासांत दाखवील काय? स्वातंत्र्य, वैयक्तिक स्वातंत्र्य, प्रामाणिक मतस्वातंत्र्य, खऱ्या लोकसत्तेचें स्वातंत्र्य प्रस्थापित करण्याचे भिक्षुकशाहीचें तोंडच नव्हे. भिक्षुकशाहीचा पिंडच मुळी जनतेच्या अज्ञानावर, अंधश्रद्धेवर आणि बौद्धीक गुलामगिरीवर पोसलेला. अज्ञान, अंधश्रद्धा आणि बौद्धिक गुलामगिरी या तीन नरकांतून वर येणाऱ्या उग्र दर्पाच्या वाफाऱ्यावरच
भिक्षुकशाहीच्या इभ्रतेची अंडी
आजपर्यंत उबत आलेली आहेत. या तीन नरककुंडांना अज्जीबात नष्ट करण्याची शेखी भिक्षुकशाहीने मारणे म्हणजे स्वतःच्या प्राणावरच कुऱ्हाड घालणे नव्हे काय ? आणि इतका आत्मयज्ञ भिक्षुकशाही दीन दुनियेकरितां करील, ही गोष्ट तर कालत्रयीहि पडणे शक्य नाहीं; कारण तशी इतिहासाची साक्षच नाही.
राष्ट्रातील सर्व लोकापेक्षा आम्ही सर्वच बाबतीत जन्मतः श्रेष्ठ व वंदनीय, म्हणूनच बहुजनसमाजापेक्षां अगदी निराळया इभ्रतीच्या रिझर्व्ड कम्पार्टमेंटमध्ये रहाणारे, अशा बाष्कळ वल्गना व्याधिष्ठाच्या आंगांवरील चिडचिडलेल्या फोडाप्रमाणे सर्व पुराणेतिहास स्मृत्यादि ग्रंथात पेरून ठेवण्यास न शरमणाऱ्या या भिक्षुकशाहीनें लोकशाहीवर पुराणें झोडणे म्हणजे स्वार्थासाठी सैतानाने बायबलाचा पाठ करण्यासारखे नव्हे काय? लोक जर अज्ञान्याचे ज्ञानी होतील, अंधश्रद्धाळूचे चिकित्सक बनतील आणि भिक्षुकशाहीने जागोजाग पेरून ठेवलेली बौद्धिक गुलामगिरीची जाळी तडातड तोडून स्वतंत्र विचाराचे स्वयंविचारी होतील, तर ते स्वयंस्फूर्तीनेच भिक्षुकशाहीला लाथाबुक्क्यांखाली तुडवून तुडवून तिचा कायमचा चेंदामेंदा करतील. यात मुळींच संशय नाही. ज्ञानप्रसाराचें हें अनिवार्य पर्यवसान न ओळखण्याइतकी भिक्षुकशाही दुधखुळी किंवा आंधळी नव्हे. आजला पाश्चात्य विद्येच्या संस्काराने लोकांत थोडीबहुत चिकित्सकपणाची तीव्रता दिसू लागल्यामुळे, सर्रास संस्कृतीला शिव्याश्राप देण्याचा वेदोक्त धंदा भिक्षुकशाही कशी इमाने इतबारे चालवीत असते. हें कोणाला सांगायला नकोच. ‘आम्हाला सुधारणा पाहिजे. परंतु ती आमच्या प्राचीन संस्कृतीशी जुळणारी अशीच पाहिजे,’ असा जो एक उद्गार भिक्षुकशाहीच्या पुढाऱ्यांच्या वेदोक्त तू नेहमी बाहेर पडत असतो. त्यात सुद्धा आत्मवर्चस्व गमावण्याची नाखुषीच मुख्यत्वेकरून असते. जुन्याला घट्ट चिकटून रहा म्हणून उपदेश करणारे राजकारणी मुरंबे रा. सितारामपंत दामले काय, शूद्रांचा जन्म सेवेकरितांच झाला आहे असे उपरणे फडकावून सांगणारे शाहूनगरवासी दादासाहेब करंदीकर काय, किंवा मनु याज्ञवल्क्याच्या स्मृतींची पातडी यलमा भक्तांच्या झालीप्रमाणें डोक्यावर घेऊन नाचणारे बापटाचार्य काय, लोकशाहीच्या प्रवचनांच्या दाखवायच्या दांतांमागेच त्यांचे भिक्षुकी ढोंगाचे खायचे स्वार्थी दांत लपलेले असतात. हे न ओळखण्याइतकी अजाण जनता आता इंग्रजी शिक्षणामुळे बरीच कमी कमी होत आहे. हे पाहून त्यांच्या पोटांत वायगोळा का उठू नये ?
* * * *
[८] आधींच भिक्षुकशाहीची धर्मविषयक लटपट आणि डोळस ज्ञानाच्या चिकित्सेची मुसंडी यांचे मोठे हाडवैर ! युरपांत या चिकित्सेचा आणि सायन्टिफिक शोधन-प्रवृत्तीचा उदय होतांच तेथील पाद्री भटांच्या
पोकळ वर्चस्वाचे कागदी मनोरे
धडाधड कोसळून चक्काचूर झाले. जनतेच्या मनोवृक्षावर चढलेली अंधश्रद्धेचीं बांडगुळें ऐतिहासिक चिकित्सेच्या तीक्ष्ण शस्त्रांनी साफ तोडून, त्यांची शास्त्रीय शोधनाच्या भट्टीत राख होताच, पाद्रीभटांचा त्यांच्या बायबलाचा आणि मोक्षप्राप्त्यर्थ त्यांच्या मध्यस्थीचा बागुलबुवा अतःपर युरपांतील जनतेला मुळींच त्रास देऊ शकत नाहीं. तिकडील सुविद्य जनतेनें
भट-बायबल-मोक्ष
या त्रयीशी छातिठोंक लढाई देऊन आपली माणुसकी व निसर्गदत्त आचार-विचार-स्वातंत्र्य आता अगदी कायमचे सिद्ध करून टाकले आहे. परंतु हे विचारस्वातंत्र्य व व्यक्तिस्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी जनतेला भिक्षुकशाहीशी युद्ध करताना अत्यंत अमानुष हालअपेष्ठा सोसाव्या लागल्या, मोठमोठ्या नवमतवादी तत्ववेत्त्यांना भिक्षुकशाहीच्या रावणी क्रोधास बळी पडून, त्यांनी पेटविलेल्या प्रचंड डोळयात आपल्या बिनमोल देहांच्या आहुती द्याव्या लागल्या. ‘इन्क्विझिशन’ नांवाने इतिहासप्रसिद्ध असलेल्या राक्षसी भिक्षुकशाहीच्या अमानुष अत्याचारांत अगणिक पुरुष स्त्रिया व मुले यांनी केवळ सत्यप्रेमासाठी आपल्या जीवाचे धडाधड बळी दिले.
हा इन्क्विझिशनचा इतिहास वाचला म्हणजे ज्याच्या अंतःकरणाची लाहीलाही उडणार नाही, असा भिक्षुकशाहीच्या पुण्याशिवाय इतरत्र दुसरा कोणी माणूस आढळावयाचा नाही हा इतिहास असे स्पष्ट सांगतो की वेळी एखादें निःशस्त्र राष्ट्र आत्मस्वातंत्र्याच्या महत्वाकांक्षेच्या जोरावर सशस्त्र अशा प्रबल सत्तेशी टक्कर देऊन आपल्या स्वयंनिर्णयाची किल्ली हस्तगत करूं शकेल परंतु सशस्त्र व सबळ राष्ट्रालासुद्धा भिक्षुकशाहीच्या मायावी, असुरी व अमंगल डांवपेंचाशी तोंड देणे फार कठीण जाईल. एखाद्या राजाची राज्यसत्ता उलथून पाडणे जितकें सुलभ आहे, तितकेच
जनतेला भिडलेली भिक्षुकशाहीची रक्तपिती
घालविण्याचे काम दुर्घट आहे. युरपांतल्या पोप पाद्री भिक्षुकांच्या म्होरकेपणाखाली भिक्षुकशाहीनें आपल्या मतांशी विरोध करणाऱ्या नवमतवाद्यांना वाटाण्यातल्या खड्यांप्रमाणे निवडून काढून, कोणाच्या हातापायांत जडजड बेड्या ठोकून त्यांना अंधार कोठड्यांत फेंकून दिलें, कोणाला अन्नपाण्यावांचून ठार मारले, कोणाचे हातपाय ‘रॅक्स’ नामक ताटीवर ताणून बांधून त्यांची हाडे अक्षरश: ठेचून त्यांचे पीठ केलें ; कोणाच्या जिभा कापल्या, कोणाचे डोळे काढले, कोणाची जिवंतपणी आगाची कातडी सोलून काढली, तर कोणाला मोठमोठ्या शहरांच्या चौकांत होळ्या पेटवून त्यांना लाखों तमासगिरांच्या समक्ष जिवंत जाळले. हैं सारें पुण्यकृत्य कशासाठी ? तर भिक्षुकशाहीच्या पुराणमतांशी त्यांनी विरोध केला म्हणून ! असल्या अमानुष अत्याचारांबद्दल क्रिस्ती भिक्षुकशाहीलाच काहीं हंसायला नको. आमच्या महाराष्ट्रांतील शहाण्या पुण्याच्या शहाण्या चित्पावन नोकरशाहीनें आपल्या सहीच्या जोरावर असले अत्याचार रगड केलेले आहेत आणि ते करतांना स्वकृत्यसमर्थनार्थ त्यांनी भिक्षुकशाहीचा बायबलग्रंथ जो मनुस्मृति तिचीच नाटकी ढाल पुढे केली होती. परंतु महाराष्ट्राचे भाग्य म्हणून त्यांनी इतरांवर जे जे अत्याचार केले त्या त्या अत्याचाराच्या एकेका प्रकारानेच चित्पावन पेशव्यांच्या घराण्यांतली एकेक व्यक्ती अखेर बळी घेतली ! कर्मवादाचें गीतारहस्य म्हणतात तें हेंच !
इतिहास संशोधन म्हणजे या जीर्णमतवादी गुडांना शुद्ध थट्टा वाटते, असे म्हणण्यापेक्षा संशोधन-चिकित्सेच्या वस्त्र्याची धार त्यांच्या अलीकडे चांगलीच प्रत्ययाला आल्यामुळे आणि त्या धारेची तीक्ष्णता सायन्सची सहा दिवसेंदिवस अधिकाधिक तीक्ष्ण बनवत असल्यामुळे त्यांनी आपल्या पूर्वपरंपरेच्या पद्धत्यनुरूप त्याकडे नुसतें धिःकारयुक्त पाहून तिची थट्टा व उपहास करण्याचे व्रत पत्करलें आहे. एखाद्या गोष्टीची भ्रूणहत्त्या करायची म्हणजे त्या गोष्टीची धि:कारपूर्वक अवहेलना करून तिच्याकडे जणूं काय आमचें लक्षच नाहीं, किंवा लक्ष देण्याचें कारणच नाही, अशी वृत्ति पत्करणे आणि ही वृत्ती म्हणजे
भिक्षुकशाहीचा शिलकी परशुरामी बाण
होय. इतिहास-संशोधन आणि चिकित्सा या दोन न्यायनिष्टूर वज्रांची जन्मभूमी युरपखंड-विशेषतः जर्मनी होय. तेथून ही अस्त्रे हिंदुस्थानांत आल्या दिवसापासून त्यांच्या वज्रप्रहारानी आमच्या ‘बाबावाक्यं प्रमाण’. धर्मशास्त्रादि ग्रंथांचा बरावाईटपणा चवाठ्यावर येऊन, त्यांतील कुभांडीपणाच्या हड्ड्या आजला चूर्ण होऊन गेल्या आहेत. जर्मन व इंग्रजी संशोधकांनी इकडे येऊन आमच्या सर्व संस्कृत वाङ्मयाचे अत्यंत कळकळीनें, निष्ठेने व चिकित्सेने अध्ययन करून, त्यांवर आपापल्या भाषेत विद्वत्तापूर्ण जितके ग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या पावपट तर राहूद्याच पण एक अष्टमांश ग्रंथ अध्ययन अध्यापनाची शेखी मिरवणाऱ्या ब्राह्मणांनी लिहिले नाहीत. उलट, या स्वार्थत्यागी पाश्चात्य पंडितांनी इकडे येऊन संस्कृत भांडाराला शतकानुशतकें लागलेली ब्राह्मणी कुलपें तडातड तोडून त्यांत सांठविलेले परंतु कालवशात् गंजून गेलेलें- हिंदभूमीचें प्राचीन ज्ञान आपल्या चिकित्सापूर्ण अध्ययनाच्या शमॉय लेदरनें घासून पुसून झक्क करून साऱ्या जगाला देतांच, धर्म बुडाला ! धर्म बुडाला !! म्हणून आमच्याकडील ब्राह्मणबुवांनी केवढा मोठा शंखध्वनि केला.
तो माणसे विसरली तरी इतिहास विसरणार नाही. फार दूर कशाला? महाराष्ट्रांतले संस्कृताचे आद्यपंडीत व आद्य इतिहास संशोधक
डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर
यांनी या पाश्चात पंडीतांना प्राचीन संस्कृत भांडाराची इत्यंभूत माहिती दिली. एवढ्याच कारणावरून त्यांच्यावर अझूनहि जळफळणारे शहाणे काय कमी आहेत ? या वेळेपर्यंत संस्कृतातले ज्ञानभांडार म्हणजे ब्राह्मणांच्या खऱ्याखोट्या श्रेष्ठत्वाचे नगारे होते ते या पायात्य व पौर्वात्य चिकित्सकांनी आरपार फोडतां ब्राह्मण्याचे बेंडच उघडे पडल्यामुळे ब्राह्मणबुवांच्या अंगाचा तिळपापड उडणे साहजीक आहे. तथापि अशाहि आणीबाणीच्या प्रसंगी ब्राह्मणांनी आपल्या कारस्थानी धोतऱ्याचें बी ठकबाजीच्या चिलमींतून या पाश्चात्य पंडीतांना यथास्थित द्यायला सोडलें नाहीं. शेंकडों उदाहरणांपैकी एकच ठळक उदाहरण घ्या. कॅप्टन कि नांवाचा एक विद्वान् शोधक इकडे आला होता. त्यानें अतोनात परिश्रम प्रवास व खर्च करून ठिकठिकाणचे जुने संस्कृत ग्रंथ व हस्तलिखितें गोळा केली आणि त्यांचे शोधन करून त्यांत अॅडम आणि ईव, मनूचा जलप्रलय इ. गोष्टींबद्दल काही संदर्भ सांपडतो की काय हे पाहण्यासाठी भरभक्कम पगार देऊन काही वेदशास्त्रसंपन्न भटजींना त्या कामावर नेमले. या भटमंडळाने विल्फाई साहेबाला खूष करण्यासाठी (पण वास्तवीक त्याला ठकविण्यासाठीच) या प्रकारची माहिती पाहिजे होती त्या प्रकारची बनावट बनवून त्याला पुरविण्याचा धूमधडाका सुरू केला. ब्राह्मण कधिं खोटें कर्म करील? मनुस्मृतीची शपथ प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या तोंडांतून पडलेला, या साऱ्या विश्वाचा प्रभू असा ब्राह्मण कधि खोटें काम करी ? बिचाऱ्या विल्फर्डनें या मंडळाकडून वेळोवेळी येणाया नोट्सवरून एक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथ लिहून काढला व तो तपासण्याच्या वेळीं अस्सल संस्कृत पुराव्यांशी मेळ घालून पहातांच या
भटमंडळाचा खोडसाळपणा
त्याच्या नजरेस आला ! त्याची ग्रंथलेखनाची सारी मेहनत पाण्यांत गेल्यामुळे त्याला निराशेच्या केवढया भयंकर यातना सोसाव्या लागल्या असतील, याची कल्पना वाचकांनीच करावी. या गोष्टीवर चर्चा करतांना सुप्रसिद्ध तत्त्ववेत्ते हेजेलसाहेब आपल्या “ Philosophy of History नामक ग्रंथांत (पृ. १७२) म्हणतात की "The Brahmins have no conscience in respect to Truth` [ या ब्राह्मण लोकांना सत्याची तिळमात्र चाड न भासण्याइतके ते उलट्या काळजाचे असतात.] यांनी आपल्या विद्वत्तेच्या पोकळ सबबीवर आपल्या कित्येक प्राचीन ब्राह्मणी ग्रंथांची मनमुराद स्तुती करून प्राचीन सिद्ध करणारे दाखले इंग्रजी नमूद करून ठेवण्याचा कित्येक युरोपिअन शोधकांना मोह पडला तर कित्येकांना आपल्या जातीबद्दल मोठ्या प्रसंशेची शिफारस पत्रे जागोजाग पेरून ठेवण्याचा आग्रह केला. या ब्राह्मणी काव्यांत बरेचसे पाश्चात्य संशोधक सांपडले खरे; तथापि म्हातारीनें कोंबडे झोकून ठेवण्याचा आटाकोट यत्न जरी केला तरी उजाडायला काही राहिले नाहीं आणि पाश्चात्य संशोधकांची अशी एक पिढी पुढे आली की तिनें या अकटोविकटो वेदशास्त्रसंपन्नांना सफाई धाब्यावर बसवून वदोपनिषदें भारतरामायणादि ग्रंथांचें स्वतः पारायण करून त्यांवर स्वतंत्र विचारांचे अनेक ग्रंथ लिहिले ऋग्वेदावर सायणार्याची टीका (ऋग्वेदाच्या जुन्यांतल्या जुन्या टीका दोन, एक सायणाचार्याची व दुसरी महीधराची. पाश्चात्य पंडीत सायणाचार्याच्या टीकेला a mere drag on the progress of Vedio Scholarship" म्हणतात (पहा S. B. East Vol. 32, Vedio Hymns p. 32) व महीधराच्या टीकेला तर सर्वस्वी अग्राह्य ठरवितात. पूज्यपाद महर्षि दयानंदसरस्वती तर या दोघांना फुटक्या कवडीचीहि किंमत देत नाहीत.)
होती, तरीदेखील ती एका ब्राह्मणानेच लिहिलेली असल्यामुळे त्यांत त्यांने
ध चा मा अनेक ठिकाणीं केला
नसेल कशावरून? या शंकेमुळे जर्मनीतला सुप्रसिद्ध प्राच्यविद्यासंशोधक वुडॉल्फ रॉय यानें तिकडे एक स्वतंत्र विचाराचा पंथ स्थापन करून, ऋग्वेदावर अगदी निराळीच एक विस्तृत टीका जर्मन भाषेत लिहून काढली. तिथी इंग्रजी भाषांतराची पुस्तकें जगभर पसरताच ऋग्वेदविषयक चर्चेच्या वावटळीने आमच्या मॅक्समुल्लर साहेबांच्या वेदविषयक कित्येक विधानांचा नुसता थरकाप उडाला
गेली कित्येक शतके स्पष्टोक्ती म्हणजे देवाचा अपमान, धर्माची पायमल्ली भिक्षुकशाहीचा उपमर्द आणि राजाचा द्रोह मानली जात आहे. प्रामाणिक विचार बोलून अगर लिहून व्यक्त करताच ते एक अघोर कृत्य मानण्याचा संप्रदाय आहे. विद्वान् चिकित्सक नवमतवाद्यांच्या ("Where a monarchy is master, enquiry is apt to be a disturbing element, and though it be exercised in the interest of the Commonwealth, it is none the less resented; where the priest is master, enquiry is sharply prohibited. The priest represents a spiritual monsrohy in which the tenets of belief are fixed, assumed to be infallible and to be prescribed by Deity. Thus the priest regarde enquiry as proceeding from an impertinent distrust, and is not reconciled on being assured that it is undertaken in the interest of truth. Thus the king denonuces enquiry as seditions, and the priest as sin. In the end, the enquirer finds himself an alien in Church and State and laws are made against his life, his liberty, property and veracity." George Jacob Holyoak, quoted in Vedic Magazine, pp. 22-23. Vol.) तोंडाला या राक्षसी जीर्ण मतवादी भिक्षुकशाहीनें
मोठमोठी मिलरची कुलुपें
ठोकलेली आहेत. स्वतंत्रपणे विचार करून स्वतंत्र बाण्याची मतें प्रसृत करणाऱ्या नमवतवाद्यांची मस्तकें या मुर्दाड भिक्षुकशाहीने वारंवार उचण्याचा पुराणोक्त व बालक प्रघात आज शतकानुशतके बेगुनाना यामुळे मानवजातीच्या प्रगतीत बेसुमार पिछेहाट होत आहे; याचें कारण विवेकशक्तीचा अंमल बहुजनसमाजाच्या खालच्या थरापर्यंत कधी पोहचूंच शकत नाहीं, ख्रिस्ती भिक्षुकशाहीनें आकाशांतल्या बापाला साक्ष ठेवून स्वतंत्र शोध करणाऱ्या नवमतवादी कोपर्निकस गैलिलियो यांचा अमानुष छळ व सावोनरोला, ब्रूनो, इत्यादिकांचे दिवसा ढवळ्या पाडलेले खून आणि इकडील भिक्षुकशाहीने मनुस्मृति प्रसविणाऱ्या ‘हातच्या आल्या’ बापाला खूष ठेवणासाठीं सतीच्या ढोंगाखाली केलेली राक्षसी स्त्रीहत्या, सोंवळ्या वेदोक्ताच्या खाली अंगावर जळती तेले ओतून पाडलेले ब्राह्मणेतरांचे खून व आत्मवर्चस्वासाठीं राष्ट्रीय स्वातंत्र्याला लावलेली भयंकर आग पाहून स्वतंत्र विचार करण्याची लोकांची प्रवृत्ति थरथर थरथर कापू लागली, तर त्यांत अश्चर्य तें काय? सात्यतत्वाने प्रज्वलीत केलेली, धीरोदात्त विचारवंतांनी स्वतःच्या सुखसर्वस्वावर तुळशीपत्र ठेवून निश्चयाच्या तडफेने जनतेसमोर उंच धरलेली सत्यनाची मशाल या भिक्षुकशाहीनें
मानवी रक्ताचे हौदच्या हौद
ओतून अनेकवेळ विझवून टाकलेली आहे. कोणत्याही काळाचा कोणत्याहि देशाचा इतिहास घ्या. त्यांतलें भिक्षुकशाहीचे वर्तन अत्यंत उलट्या काळजाचे व बेगुमानपणाच दिसून येते. भिक्षुकशाहीनें आजपर्यंत धार्मिक अडत्येगिरीचा धंदा करून, ईश्वराच्या स्वर्गीय खाणावळीच्या सायुज्यमुक्तीच्या दालनांत मोक्षामृताचे
ओंठभर भुरके आणि पोटभर जेवण
कोणाला घातलें असेल तें असो, त्यांनी सत्यसंशोधकांचा अमानुष छळ, बीभत्स विपर्यास व तीक्ष्ण उपहास केल्याचें मात्र इतिहासाच्या भरभक्कम पुराव्यानें सिद्ध होत आहे. या भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाचा डोलारा नेहमी पौराणिक दंतकथा, अविश्वसनीय चमत्कार, खोटे दस्तऐवजी यांचे पुरावे, भुताखेतांची आणि नरकांची जरब आणि त्यांनी आपल्या अष्टपैलू मेंदूतून निर्माण केलेल्या देवांच्या अहल्येगिरीची जन्मसिद्ध सनद इत्यादी कडीकोयंड्यांवरच झुलत असतो. अर्थात् या कडीकोयंड्यांना सफाई विचकून उखडल्याशिवाय जनतेच्या बोकांडी बसलेलें हें
भिक्षुकशाहीचें जुनपुराणें भूत
कायमचें गाडलें जाणार नाही. इकडे आमच्या वाचकांचे पूर्ण लक्ष असावें. ब्राह्मणेतरांची चळवळ या लोकमान्य शब्दयोजनेने आतां सुप्रसिद्ध होत असलेल्या सुधारकांचा कटाक्ष ब्राह्मण म्हणविणाऱ्या समाजाविरूद्ध नसून या भिक्षुकी कारस्थानाविरुद्ध आहे. या चळवळीचे शरसंधान व्यक्तींवर नसून प्रवृत्तीवर आहे. शेक्सपियरने सहावा हेन्री नाटकाच्या ३ ऱ्या भागांत ग्लॉस्टरच्या तोंडी जे विचार घातलेले आहेत त्यांची आणि या की प्रवृतीची किती बिनतोड एक वाक्यता होते, हें विचारी वाचकांस अधिक खुलाशाने सांगणे नको.
ग्लास्टर म्हणतो :
Why, I can smile, and murder whiles I smile;
And cry content to that which grieves my heart;
And wet my cheek with artificial tears,
And frame my face to all occasions.
I`ll drown more sailors than the merimaid shall;
I`ll slay more gazers than the basilisk;
I`ll play the orator as well as Nestor;
Deceive more slily than Ulysses could;
And like a Sinon, take another Troy;
I can add colours to the cameleon;
Change shapes with proteus for advantages;
And set the murderous Machiavel to school.
Can I do this, and cannot get a crown?
Tut, were it further off, I`ll pluck it down;
बाबरा राजकीय असो, सामाजिक असो नाहीतर धार्मिक असो, जेथें जेथें अनुदारपणा, हट्टीपणा आणि विरोधाचा कर्कशपणा दिसून येईल, तेथें तेथे मुळाशी ही ग्लॉस्टरी भिक्षुकी प्रवृत्ती असलीच पाहिजे असा एक अबाधित सिद्धांत गेली शंभरावर वर्षे सुशिक्षित महाराष्ट्रीयांच्या पूर्ण प्रचितीस आलेला आहे. या भिक्षुकी प्रवृत्तीनें आपली सत्ता ब्राह्मणेतर समाजांवर अबाधित राखण्यासाठी बाळंतिणीच्या खोलीपासून तो स्मशानांतील सरणापर्यंतच्या बऱ्यावाईट आचार विचारांचा मक्ता आपल्या हाती ठेवल्यामुळे, लहान लहान मुलें व भोळ्या भाबड्या बाया यांच्यांत
अंधश्रद्धेचें जालीम जहर
त्यांनी सपाटून पेरण्याचा उपक्रम आजपर्यंत केलेला आहे. त्यांच्या कोमल तुरुतुल्य बुद्धीला आणि कल्पनेला आपल्या पौराणिकी गप्पांनी भ्रष्ट व पतित करून करूनच भिक्षुकशाहीनें हिंदुसमाजाचे हातपाय बौद्धिक गुलामगिरीच्या लोखंडी साखळदंडांनी करकचून आवळून टाकले आहेत. सुखसंपन्नाना नरकाची भीति दाखवून आणि दुःखपीडितांना अध्यात्मिक मुलाम्याच्या खोट्यानाट्या गप्पांची अश्वासने देऊन देऊनच हे भिक्षुकशाहीचे भूत आजवर आपल्या सत्तेची दमधाटी चालवित आले आहे. वरपांगी अध्ययन अध्यापनाची शेखी भिक्षुकशाही पुष्कळच मिरविते; परंतु शिक्षणाच्या प्रसाराला शक्य तितके अडथळे आणण्याची तिची खटपट नेहमीच जारी सुरू असते, शिक्षणाच्या प्रसाराबद्दल लिहितांना किंवा बोलतांना ` शाळाखात्यांत ब्राह्मण मास्तरांचाच भरणा इतर सर्व जातींपेक्षा जास्त आहे. अर्थात् बहुजनसमाजाचे शिक्षण हे असून ब्राह्मणांच्याच हाती आहे.` असे एक विधान भिक्षुकशाही वारंवार करीत असते. परंतु प्रचलित शिक्षणाचे आणि ते देणान्या मास्तरांच्या मास्तरकीचे पृथ:करण केलें तर धन्याला दूध देण्याकरिताच म्हैस फळते, या ग्राम्य परंतु समर्पक म्हणीचा दाखला कोणास पटणार नाहीं? वास्तवीक स्थिति कशी आहे ती पहा. शिक्षणाचा प्रसार बौद्धिक प्रगति व स्वतंत्र विचारांची चिकित्सा यांचे आणि या मुर्दाड भिक्षुकशाहीचे मोठे हाडवैर!
आम्ही सांगूं, तुम्ही ऐका
ही या भिक्षुकशाहीची सनातन दण्डनीति. त्यांच्या पौराणिक चर्पटपंजरीवर कोणी शंका काढतां कमा नये. सर्व सद्गुणांतला मेरुमणी म्हणजे अंधश्रद्धा आणि तात्काळ नरकाला नेणारा दुर्गुण म्हणजे शंका, एवढ्या भांडवलावर भिक्षुकशाही आपल्या नाटकी वर्चस्वाचा संसार बिनधोक चालवित आहे. जेथे जेथें या भिक्षुकशाहीचे पाऊल पडलें किंवा बोट रुतलें, तेथे तेथे त्यांनी मूढविश्वासाचें बीज पेरण्याची संधी मुळींच वाया जाऊ दिली नाही. त्यांनी आजपर्यंत जर काही मोठे शतकृत्य केलें असेल तर ते लोकांची मनें लंजूर करून त्यांच्या कल्पना भ्रष्ट व गढूळ करणें हेंच होय. या भिक्षुकशाहीच्या पुराणप्रवचनांनी लाखों लोक- स्त्रिया व पुरूष-शुद्ध वेडेपीर बनल्याचे दाखले आहेत. दांभिकपणा हा भिक्षुकशाहीचा मोठा प्यारा सद्गुण आणि स्पष्टवक्तेपणा म्हणजे तात्काल नरकाचें साधन, जनतेनें भिक्षुकशाहीच्या दुष्ट कारस्थानांचा वेळ : कार व प्रतिबंध न केल्यामुळे मेणाच्या गोळीप्रमाणे त्यांनी लोकांची मने गुलाम वृत्तीच्या सांध्यात जाम दडपून दडपून त्यांना आजला गुलामांपेक्षां गुलाम बनवून सोडलें आहे; आणि या गुलामांच्या परावलंबी व परप्रत्ययनेय स्थितीवरच भिक्षुकशाहीची गुंडगिरी आजपर्यंत बिनधोक चाललेली आहे.
[९] एतद्देशीय व परदेशीय चिकित्सक संशोधकांनी चर्तेुदांपासून तो परवा निर्माण झालेल्या बोपदेवकृत ‘व्यासोऽयाच’ भागवतापर्यंत सर्व ग्रंथांची छाननी करून त्यांच्या खरेखोटेपणाची पूर्ण चिकित्सा केल्यामुळे आमच्या पुराणमताभिमानी भिक्षुकशाहीच्या गुलामांच्या व्यापाराला जबरदस्त खो बसला आहे. तथापि त्यांच्या पायांच्या पुण्याईनें हिंदुसमाजाचा ७/८ भाग अझून बराच अशिक्षित असल्यामुळे, या ठिकाणीं नाहीं तर त्या ठिकाणी, पुण्यास नाहीं तर साताऱ्यास, नाशिकास नाही तर पंढरपुरास या समाजांत नाहीं तर त्या समाजांत कोठेतरी जेथें दिधेचा सारासार बुद्धीचा व चौकसपणाचा घातकी वारा वहात नसेल अशा निवांत प्रदेशांतल्या जडमूढ लोकात आपली भिक्षुकी गुलामगिरी पसरविण्याचा यांचा उद्योग जारीने अव्याहत चालूच आहे. पाश्चात्य विद्वानांनी इकडे येऊन वेदोपनिषदादि संस्कृत ज्ञान भांडाराच्या किल्ल्या भिक्षुकशाहीच्या हातून हिसकावून घेऊन, त्यातली ज्ञानसंपत्ति जर बंधमुक्त केली नसती, तर आजला तिचा पूर्ण विपर्यास नव्हे. सत्यानाश होऊन,
ब्राह्मण सांगतील ती पूर्वदिशा
असा भयंकर दुरावस्थेचा प्रसंग हिन्दु जनतेवर ओढवला असता. खरे म्हटले तर बहुजनसमाजाची स्थिति वास्तविक सध्याहि अशीच आहे आणि ती यावच्चन्द्रदिवाकरो आहे तशीच रहावी, यासाठी भिक्षुकशाहीचे शहाणेसुर्ते बृहस्पति रात्रंदिवस प्रयत्न करीत असतात. संस्कृत ज्ञानभंडाराचे गौप्य इंग्रज व जर्मन यवनांनी प्रगट केल्यामुळे भिक्षुकशाहीच्या पोकळ श्रेष्ठत्वाचा बोजवारा उडाला. तथापि अशा प्रसंगी न डगमगतां त्यांनी पुराणांतल्या व्यासोवाच गप्पांच्या जोरावर आणि वेदोपनिषदादि ग्रंथावर स्वतःच्या भिक्षुकी मल्लीनाच्या लिहून युरपियन शोधकांच्या शोधांना खोडसाळ ठरविणारे अनेक विपर्यासपूर्ण ग्रंथ लिहून प्रसिद्ध करण्याचा एकसारखा सपाटा सुरू ठेवलेला आहे. एकाला छू करून दुसऱ्याला त्याच्या मागे लावण्यांत भिक्षुकशाही आधीच चांगली प्रख्या पावलेली त्यात अठराव्या शतकाच्या पूर्वाधांत बर्बरदेशस्थ उर्फ परशुराम क्षेत्रस्थ चित्पावन समाज एनकेन प्रकारेण एकाकी त्यांच्यांत येऊन सामील होताच, हिंदूच्या राजकीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रांत
भिक्षुकशाहीच्या ब्युरोक्रॅटीक लीला
`न भूतो न भविष्यति धिंगाणा घालण्यास पूर्ण समर्थ झाल्या. या धिंगाण्यांचे पर्यवसान चित्पावनांनी अत्यंत धूर्ततेनें व कुशलतेने इतक्या थराला आणून भिडविलेले आहे की त्यांच्यातील बऱ्याच मंडळींनी भिक्षुकशाहीचा धाबळी पंचा झुगारून देऊन राष्ट्रीयत्वाची झकपक कल्हई जरी आपल्या सर्वांगावर सफाईत चढवून घेतली आहे. तरी त्यांच्या एकंदर राष्ट्रीय महात्म्याचा आत्मा शुद्ध भिक्षुकी ब्युरोक्रसीनेंच चैतन्यपूर्ण झालेला स्पष्ट दिसतो, या कंपूची जी काही ठाम मतें ठरलेली असतील, तीच सर्व लोकांनी निमूटपणे कांहीहि तक्रार न करितां मान्य केलीच पाहिजेत, अशी यांची
पुणेरी हस्तिदंती दंडनीति
आहे. त्यांनी ज्यांना हरिभक्तिपरायण ठरविले ते ह. भ. प. मग ते जरी शुक्रवार पेठेत त्रिकाल फेरफटका करणारे वारयोषितापारायण असले, तरी त्याबद्दल कोणी ब्रहि काढता कामा नये. त्यांनी एखाद्याला देशभक्त ठरविल्याशिवाय तो दे. भ. असणें किंवा होणेच शक्य नाही, मग जात्या तो कितीहि नीच दानतीचा आणि कवडीमोल अकलेचा असला तरी हरकत नाहीं. जसें क्रिस्ती होण्यासाठी जारडन नदीच्या पाण्याचा ‘कुरुस’ छातीवर व टाळक्यावर पाद्रीभटाच्या हातून काढवून घ्यावा लागतो, त्याप्रमाणे ज्याला देशभक्त व्हायचे असेल त्याने पुण्याच्या राष्ट्रीय शुक्रवार बलवाच्या थालेपीठ भजांची दिक्षा घेऊन महिना पंधरा दिवस तेथील कचोपकचांची शागिर्दी केली की बस्स! तात्काळ तो दे.भ.बनतो. विद्वत्तेची, देशभक्तीची, सुदार्नेची वगैरे सर्व गोष्टींची ताम्रपटें येथून मिळविल्याशिवाय जगांत म्हणजे महाराष्ट्रांत कोणीहि मानवाचा कारटा विद्वान, देशभक्त, किंवा निष्काम कर्मयोगी निपजूच शकायचा नाही, असा एक अलिखित कायदा (unwritten law ) झाला आहे.
या कायद्याला विरोध करून कोणी आपली स्वतंत्र बाण्याची मते प्रतिपादन करू लागला तर त्याचे वाभाडे काढायला आमचे पुणेकर केसरी महाराजसुद्धा आपले सिंहाचे भाडोत्री कातडें व मुखवटा पार फेंकून देऊन, लूत लागून पिसाळलेल्या
कुत्र्याप्रमाणे भुंकू लागतात
मग त्यांच्या प्रभावळीतल्या पोसलेल्या गर्दभांच्या लाथादुगाण्यांचा खडखडाट आणि धड़पडाट काय वर्णन करावा? स्वतःच्या हातांत दर्भाइतकीहि सत्ता नसतांना हें भिक्षुकशाहीचें पुणेरी भूत आपल्या राष्ट्रीय गुंडगिरीचा धिंगाणा घालतांना जर ढुंगणाचे सोडून डोक्याला गुंडाळायला कमी करीत नाहीं, तर उद्या खऱ्याखोट्या लोकशाहीच्या कौन्सिलांत यांच्या प्राबल्याची शीग जर उंचीवर चढली तर से सर्वांच्या डोक्यावर मिरें वांटून विसाव्या शतकात पुनश्च पेशवाई पाट्यावरवंट्याचा जीर्णोद्धार कशावरून करणार नाहीत, याची हमी कोणत्या विमा कंपनीनें घेतली आहे ? पुराणांच्या बंडाच्या धामधुमीतच निरनिराळ्या तीर्थांचा महिमा भिक्षुकशाहीने पुकारून त्या त्या क्षेत्रांच्या ठिकाणी आपल्या भिक्षुकी ऊर्फ बडवेगिरीच्या छावण्या थापल्या.
तीर्थमहिम्यांचे आद्यकल्पक म्हटले म्हणजे काशीकर भिक्षुक होत, त्यांनी गंगेच्या आणि काशीविश्वेश्वराच्या महात्म्याचे स्तोम काशीखंड नामक प्रचंड ग्रंथ प्रसवून माजविले या योजनेने त्यांना बरीच किफायत मिळवून दिली. हे पहातांच गयामाहात्म्य, प्रयागमहात्म्य, नाशिक पंचवटी महात्म्य इत्यादि महात्म्य ग्रंथांच्या फलटणींचा पाठोपाठ सुळसुळाट उडाला आणि भीक मागण्यावर अवलंबून राहणाऱ्या भिक्षुकांच्या पायांशी घरबसल्या छिनाल लक्ष्मी लोटांगणे घालीत येऊ लागली. हा क्रम अझूनपर्यंत अप्रतिबंध चालला असून आणखीहि नवीन नवीन क्षेत्रे व त्यांचा महिमा रोज जन्माला येत आहेत. या सर्व धांगडधिंग्याचा जनतेच्या धर्मविषयक कल्पनांवर केवढा चमत्कारिक परिणाम झाला आहे तो पहा. गयेच्या गयावळानें
तेरे पितर सरग भयो !
म्हटल्याशिवाय कोणत्याहि हिन्दूचा बाप स्वर्गाला सुखरूप पोहचत नाही. प्रयागास वेणीदान केल्याशिवाय पुढे येणाऱ्या अनंत जन्मांत नवरा बायकोच्या जोड्या कायमच्या ठरल्या जात नाहीत. नाशिकच्या कारट्यांच्या तोंडच्या मंत्राशिवाय आईबापाच्या नांवाने दिलेले पिंड खमंग बनत नाहीत व गोदावरीतल्या माशांनी ते पिंड खाल्ल्याशिवाय आईबापांच्या पोटांत ते उतरत नाहीत. बाप मेला असता गोदातटाकीच्या भिक्षुकी कसायीखान्यांत नाशिकच्या न्हाव्याकडून जन्मदात्या मातृदेवतेला भादरविण्याकरितां पाठविल्याशिवाय बाप मोक्षाला जात नाहीं किंवा पुत्र मेला असता त्याच्या तरण्याताठया पत्नीचा केशकलाप उतरवून, नाशिकच्या शूद्र न्हाव्याने तिला एकांतात एकटी नेऊन बोडकी (हा शब्द काढून टाकण्याबद्दल आमच्या एका मित्रानें सूचना केली होती; परंतु ती अत्यंत नाखुषीने आम्ही अमान्य केली. परपुरुषस्पर्शाबद्दल आमच्या हिंदु ललनावर अत्यंत तीक्ष्ण कटाक्ष ठेवणारे सोज्वल व उच्च संस्कृतीचे म्हणविणारे हिंदु बांधव त्याच दुर्दैवी आया बहिणी सुना कन्याचा पति सृष्टिक्रमानुसार मरण पावताच, सारासार विचार आणि लाजलज्जेची फारकत करून, त्यांना आमरण दर आठवड्यास शूद्र न्हाव्याशी एकांतात किळसवाण्या स्थितीत बसविण्याचा अवैदिक धर्मसोहळा सुरू करण्यास जर शरमत नाहींत, किंवा स्वतः ची स्मश्रु उरकिल्यानंतर त्याच न्हाव्याला ` मागल्या दारी जा` म्हणून सांगण्यांत खंति बाळगीत नाहींत. तर आम्हीं नुसता ‘बोडकी’ शब्द उपयोगांत आणल्याने त्याच शहाण्या हिंदूंच्या मनाला एवढा जबरदस्त धक्का का बरें बसावा? बस्स ! पुरे करा हा शब्दांच्या मृदुलतेचा नाटकी फार्स ! एन ४०२०-१७अ) केल्याशिवाय त्या हतभागिनीच्या सासऱ्याला आपल्या पुत्राच्या
स्वर्गातल्या रवानगीची पावती
मिळाल्यासारखे वाटत नाही. वर्णसंकर वर्णसंकर म्हणून बोंबाबोंब करणारे उच्च संस्कृतीचे हिन्दुलोक - विशेषतः स्वतः स धर्ममार्तण्ड समजणारे ब्राह्मणबुव- आठवड्यांतून एकवेळ आपल्या जातीतील विधवांना शूद्र व अपरिचित न्हाव्यांशी एकांत करण्याची बिनतक्रार परवानगी देतात, भिक्षुकशाहीचें क्षेत्रमहात्म्य ब्रह्मदेवाच्या बापाला सुद्धां खचित उलगडणार नाहीं. चातुर्मासात किंवा सिंहस्थांत अखिल हिंदुस्थानांतल्या कोणत्याहि जमिनीवर जरी विवाहसंस्कार करण्याची परवानगी अगर सवलत भिक्षुकशाहीनें हिन्दु लोकांना ठेवलेली नाहीं, तरी ते त्याच हंगाम खुशाल क्षेत्राच्या ठिकाणी करण्यास भिक्षुकी धर्मशास्त्राने पूर्ण मुभा ठेविली आहे.
शिवाय हीं क्षेत्र म्हटली म्हणजे कसलीहि
पातकें धुणाऱ्या धोब्यांच्या भट्टया
आहेत. नाशिकच्या पंचवटीचे महात्म्य शिवपुराणांत जेहत्ते काय सांगितले आहे.
आजन्ममरणाभ्यासात् वाराणस्यां तु यत्फलम् | तत्फलं निमिषार्धेन पंचवट्यां निवासिनः ॥
यंवरे रे यंव ! कशी केली काशीच्या भिक्षुकशाहीवर नाशिकच्या कारटेशाहीनें मात! जन्मभर काशीत राहिल्यानें जें पुण्य मिळते, तेंच पुण्य नाशिकच्या पंचवटीत एका निमिषार्धात १/१०० सेकंड वास्तव्य केल्यानें प्राप्त होते. पहा, पापपुण्याच्या बाजारांत भिक्षुकशाहीची कशी चढाओढ चाललेली असते ती पाहून घ्या, साम्राज्यपदापासून तो गटारे झाडणाऱ्या झाडूपर्यंतचे वाटेल त्या दर्जाचे ऐश्वर्य घरबसल्या कामधेनू ताईत विकून प्राप्त करून देणारे अथणी संकेश्वराचे ब्रह्मदेवाचे बाप, आंजर्ले मुर्डीचे ‘मी खरा कृष्णशास्त्री’ म्हणणारे भांडकुदळ धन्वंतरी किंवा निपाणीच्या गटारातून मलेरियाच्या जंतूप्रमाणे दरदिवशी शेंकड्यांनी निर्माण होणारे द्राक्षार्कमधुवाले, जसे एकमेकांना गाढव चोर लुच्चे म्हणून आपल्या मालाच्या जाहिराती देत असतात किंवा मागें हाजी कासम आणि किलिक निक्सनच्या कोकणपट्टीला जाणाऱ्या बोटीबोटीत चुरशीचा सामना लागल्यावर प्रवाशांना फुकट तिकिटे देऊन आणखी वर चणेकुरमुरे शेवगावचा भजीचिवडा देण्याची एकमेक सरशी करीत होते त्याच मासल्याची ही
क्षेत्रस्थ भिक्षुकशाहीची चढाओढ
नव्हे काय ? साबरमतीचें महात्म्य तर याहून जास्त सवलतीचे आहे. "काश्या माघे च यत्पुण्यं सर्व तीर्थेषु यत्फलम् । तत्फलं समवाप्नोति सात्रमत्यांवगाहनात् ॥ " गंगा महात्म्यांतील धोब्याची भट्टी तर याहून फारच थोड्या श्रमाने पातकांचा मळ धुवून टाकते,
गंगा गंगेति यैर्नाम योजनानां शतैरपि । स्थितरुच्चरितं हन्ति पापं जन्मत्रयाऽर्जितम् ।
गंगा गंगेति यो ब्रुयात् योजनानां शतैरपि । मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति ॥
अर्थ:-गंगा गंगा असे शंभर योजनावरून जरी नाम उच्चारलें तरी तीन जन्मांची पातकें नाश पावतात. गंगा गंगा असा चारशे कोसांवरून नामोच्चार केला तरी तो प्राणी सर्व पापापासून मुक्त होऊन विष्णुलोकाप्रत जेहत्ते जातो का? किती झटपट धोब्याचा कारखाना भिक्षुकशाहीनें काढला! याच्यापुढे गीतेतील कर्मवाद काय रडणार? याशिवाय भस्ममहात्म्य, रुद्राक्षमहात्म्य, बिल्वमहात्म्य, गोपिचंदनमहात्म्य इ. खंडोगणती महात्म्याच्या पातकें धुणाऱ्या भट्ट्या भट्टांनी आपल्या सुपीक मेंदूतून निर्माण केलेल्या आहेत परंतु के. लोकहितवादी म्हणतात ( स्वाध्याय पू. १२१)"अशा तीर्थयात्रादिकेंकरून कसाहि पापी पुरुष शुद्ध होण्याच्या ज्या त्या त्या तीर्थांच्या व क्षेत्रांच्या महाल्यात प्रतिज्ञा गाइलेल्या आहेत, त्याप्रमाणे कोणीहि
पश्चातापी बाटलेल्यास शुद्ध करून
आपल्या ज्ञातींत घेत नाहींत, किंवा अन्यजातीयांस हिन्दु करीत नाहींत (सन १८८० सालचे लोकहित वादींचे हे उद्वागार आणि अलीकडची हिंदू मिशनरी चळवळयातील कार्यकारणभावांकडे वाचकांचे लक्ष असावे. आणि तसेच, पुनर्विवाहास शास्त्राधार असतो हट्टवादीपणानें व धरसोडीनें अनाथ अबलांस वैधव्यात ठेवतात. "खरें, अगदी अक्षरक्ष: खरे.
परंतु हीं जी पापविमोचनांची सोंगेंढोंगे भिक्षुकशाहीनें काढली, ती पापविमोचनांच्या उदात्त हेतूनी मुळीच नसून, ती आपल्या क्षेत्रांची व ब्राह्मणजातीची महात्म्ये वाढविण्यासाठीच काढलेली आहेत, हे मुख्य लक्षांत ठेविलें पाहिजे. नुसते काशी नाशीकच्या गंगेत बुचकळी मारल्याने, भस्माचे पट्टे व गोपीचंदनाचे टिळे लावल्याने, गंगा गंगा काशी काशी असा नुसता नामोच्चार केल्यानें किंवा
न्हाव्याकडून विधवांच्या हजामती
करविल्यानें पातकें जर भस्म होती, तर आजला तीच क्षेत्रांची ठिकाणे कुंटणखाने बनून तेथले ब्राह्मण अनीतीचे दुर्वर्तनाचे व नानाविध व्यसनांचे पुतळे बनलेले का दिसले असते? चिळसालाही चिळस आणणारी ही दुस्थिति उघड्या डोळ्यांनी धडधडीत पहात असूनसुद्धा आमच्यातल्या शहाण्या सुशिक्षितांना भिक्षुकशाहीबद्दल काहीच खंत येऊ नये, हे कशाचे लक्षण? भिक्षुकशाहीची पुण्याई कां सुशिक्षितांचे अज्ञान? बिचाऱ्या अजाण जनसमूहाची गोष्ट एक असो, बौद्धिक गुलामगिरीत खितपत पडलेली गरीब बिचारी जनता शेंदूर माखलेल्या दगडापुढे हीनदीन स्थितींत लोटांगण घालायला जर सोडीत नाही, तर या धाबळी पांघरणाऱ्या भस्मगंधाचे पट्टे ओढणाऱ्या अक्षरशून्य ब्रह्मसमंधाच्या पायांवर कपाळे घासून
माझ्या बापाला मुक्तीला पाठवा हो !
म्हणून त्यांनी त्यांची काकुळतीने याचना केल्यास, त्यांत मुळीच आश्चर्य नाही, ही दुःसह परिस्थिति पाहिली म्हणजे असे वाटू लागतें की आचारविचारांत भयंकर क्रान्ति होऊन तिच्या घुमश्चक्रीच्या वादळात आधणांतल्या बटाट्याप्रमाणे ही पृथ्वी जरी अखंड कोलमडत राहिली तरी पत्करली, परंतु विचारशून्य आंधळ्या श्रद्धेची ही स्मशानशांतता नको! गेल्या चारपाचशे वर्षांचा खुद्द महाराष्ट्रांतील ब्राह्मणेत्तर हिंदु समाजाचा सामाजिक इतिहास किंचित लक्षपूर्वक पाहिला तर सारासार विचार करून आपले नैतिक बळ वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याऐवजी ज्याची त्याची उडी स्वतः चे नाक कापून दुसऱ्यास अपशकून करणाऱ्या
ब्राह्मणांच्या ब्राह्मण्याची नक्कल
करण्याकडे फार! ब्राह्मण्यांनी सोवळ्या ओवळ्याचे बंड माजविले, लागले हे त्यांची नाल करायला. ब्राह्मण अर्थशून्य मंत्रजागराचा कोलाहल करू लागले, केली यांनी सुरुवात तसल्याच अर्थशून्य शंखध्वनीला. ब्राह्मणांनी विधवाविवाह बंद केले, यांनी बंद केले. विधवांना नवऱ्याच्या प्रेताबरोबर जिवंत जाळायच्या. होय जाळायच्या. केली सुरुवात विधवांना सकेशा न ठेवता विकेशा करण्याची पद्धत ब्राह्मणांनी पाडली, लागले हे तोच राक्षसी प्रकार आपल्या समाजांत प्रसार करायला, आणि हे एवढे कशासाठी? तर ब्राह्मणाइतकेच उच्च संस्कृतीचे लोक आम्ही आहोंत हे जगांत दाखविण्यासाठी. (नमूद करण्यास आनंद वाटतो की ही ब्राम्हण्याची कोरडी नक्कल करण्याची क्षुद्र प्रवृत्ति क्षत्रिय मराठ्यांनी आजपर्यंत केव्हांहि उचलली नाहीं, हें मोठें अभिनंदनीय कृत्य होय. विशेषतः सप्तकुळी आणि शाण्णव कुळीच्या जातीवंत मराठ्यांच्या खासगी वर्तनांत प्राचीन रजपुती रीतीभातींचेंच प्राबल्य अझून विशेष दिसून येतें, हे लक्षांत ठेवण्यासारखें आहे.) यात वैदिक हिंदु धर्माचरणाचा उत्साह तिळमात्र नसून नुसत्या वरपांगी मिरविता येणाऱ्या संस्कृतीच्या कोरड्या झकाकीसाठी ही सारी चढाओढ आहे. हे कोणालाहि दिसून येईल. आपापल्या समाजाची विशिष्ट संस्कृतीची परंपरा एका बाजूस ठेवून दुसऱ्या च्या बाह्य वर्तनाची नुसती नक्कल करताना हा गेलें हूं गेलें असें होऊन हाती धुपाटणे आले आहे. ह्यणजे प्राचीन परंपरा आचारहीनत्वामुळे नष्ट झाली आणि ब्राह्मण्यांचा बाहा अनुकरणामुळे त्याच्या अंतरंगाचाही ठाव हाती लागला नाहीं! त्यामुळे या नहिन्दुर्नयवनांचा सारा जोम आतां शाब्दिक फुशारक्यापलीकडे कशांतही उरलेला नाहीं. ब्राह्मण्याची वरपांगी नक्कल करण्यांत बेसुमार भडकलेल्या एखाद्या महाराष्ट्रीय समाजाचे उदाहरण पहावयाचे असल्यास वाचकांनी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाची जुनी पिढी अवश्य पहावी. नवीन पिढी बरीचशी शुद्धीवर आली आहे. अनुकरणप्रवृत्ति ही गुलामांची निशाणी आहे आणि विचार व आचार-स्वातंत्र्य हे समाजाच्या किंवा व्यक्तींच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. चालू मन्वंतरात ब्राह्मण सदरात मोडणाऱ्या समाजांशी स्पर्धा करणाऱ्या ब्राह्मणेतरांनी प्रथम ही गुलामगिरीची अनुकरणप्रवृत्ति साफ धुवून टांकून `आपण आपणांसी ओळखावें या नांव ज्ञान प्राप्त करून घेण्याची खटपट केल्यास, शुष्क वादविवादांच्या दगडी तटांवर व्यर्थ टाळकी हापटून घेण्याचा अतिप्रसंग अज्जीबात टळेल.
* * * *
प्रकरण ३
रक्तांत रसरसणारा खुनशीपणा
(१०) ऋगवेद काळापासून हिन्दुस्थानचा इतिहास पाहिला तर जेव्हां जेव्हां ब्राह्मण आणि (सर्व ब्राम्हणेतरांच्या वतीने) क्षत्रिय यांचे झगडे लागत, आणि क्षत्रियांच्या जगविख्यात पराक्रमानें भिक्षुकशाही नेस्तानाबूद होत असे निदान क्षत्रियांच्या नजरेच्या जरबेने योग्य मर्यादेत रहात असे, तेव्हां तेव्हांच या देशाच्या भाग्यसागराला अपरंपार भरती आलेली आहे; आणि ज्या ज्या काळी भिक्षुकशाहीचा वरपगडा झाला त्या त्या काळी हिन्दुस्थानच्या सामाजिक धार्मिक व राष्ट्रीय वैभवाला पूर्ण ओहटी लागून तें रेताड वाळवंटाप्रमाणे भयाण व ओसाड बनल्याचे फोटोग्राफ इतिहासांत स्पष्ट उमटलेले आहेत. ईश्वरस्सर्वभूतानां प्रदेशेऽर्जुन तिष्ठति असली व्यापक व उदात्त भावना भिक्षुकशाहीनें एकदांहि व्यक्त केल्याचे आढळत नाही. यांनी लिहिलेले उपनिषत ग्रंथ पहा आणि भिक्षुकशाहीने लिहिलेली पुराणांचि पातडी पहा, म्हणजे याचा उलगाडा तेव्हांच होईल. भिक्षुकशाहीचा ट्रेडमार्क म्हटला की हृदयाचा संकुचितपणा, मनाचा कोतेपणा आणि प्रवृत्तीचा नीचपणा यांचेच त्यांत प्राबल्य फार. यामुळे भिक्षुकशाहीच्या कोणत्याहि वंशात ईश्वराने आजपर्यंत कधिहि अवतार घेतलेला नाही. इतकेच नव्हे तर कलियुगाचा शेवटला अंक संपून त्याचा ‘ड्रॉप’ पडल्यावर, पुनश्च सत्ययुगाचा नवीन प्रारंभ करण्याचा मान मरु आणि देवापि या दोन क्षत्रिय तपस्व्यांसच मिळणार आहे, आणि त्याकरितां ते कलाप नांवाच्या नामांत तपश्चर्या करीत बसले आहेत, अशी पुराणात हकीकत सांपडते. या नवीन युगाच्या ओपनिंग सेरेमनीचा मान ब्राह्मणी पुराणेसुद्धा एकाद्या ब्राह्मणांस का देऊ शकली नाहीत बरे? आधी मुळीं दशावताराची कल्पना अज्जीबात खोटी असून या उनाड कन्येला जन्म देण्याचें उनाड कृत्य ब्राह्मणी पुराणानीच केलेले आहे. ऋग्वेद उपनिषदें किंवा महाभारत यांत दशावतारांचा काहीही उल्लेख नाहीं. ब्राह्मण्याचे अवास्तव स्तोम माजविणाच्या नाटकी पुराणांनी त्यांत
वामन आणि परशुराम
हे दोन काल्पनीक ब्राह्मणी अवतार मुद्दाम घुसडून दिलेले आहेत आणि आता नुकतेच भिक्षुकशाही पुठ्यातल्या एका कवीनें अकरावा अवतार सुद्धा आपल्या मेंदुतून प्रसविण्याचे भिक्षुकी धाडस केलेलें आहे. परंतु भिक्षुकशाहीनें फैलावलेल्या पौराणिक कादंबऱ्या क्षणभर टांचेखाली दडपून धरून, इतिहासाच्या स्वच्छ दुर्बिणीतून गेल्या चार हजार वर्षांचा काळ पहा की आजपर्यंत
धर्मस्थापनेचे नर | ते ईश्वराचे अवतार ||
जर कोणत्या वर्गात निर्माण झाले असतील तर क्षत्रियांतच आणि परमेश्वरानें क्षत्रियांशिवाय इतर कोणत्याहि समाजांत कधीही अवतार घेतलेला नाहीं, हेंच आपल्या दृष्टीस पडेल. वर्तमान भिक्षुकशाही मोठ्या अट्टाहासाने म्हणत असते की सध्यां हिन्दुस्थान निःक्षत्रिय झाले आहे. ही गोष्ट जरी खरी असेल, तर साधूच्या परित्राणासाठी, दुष्कृताच्या विनाशासाठीं आणि धर्माच्या संस्थापनेसाठी हिंदुस्थानांत या उप्पर ईश्वराचा अवतार होणेच शक्य नाहीं, हे त्यांनी लक्षांत ठेवावें, आजपर्यंत साधूंचा परित्राण, दुष्कृताचा विनाश आणि ‘पृथिव्यां सर्व मानवाः’ ला विळखा घालून त्यांना विश्वात्मैक्य भावाच्या एकछत्री साम्राज्याखाली आणणारी धर्मसंस्थापना क्षेत्रीय वीरांनीच केलेली आहे. भिक्षुकशाहीने जर काही केलेच असेल तर आपल्या इतिहासप्रसिद्ध संकुचित व क्षुद्र हृदयाच्या खाणीतून
पंथभेदाचे दगडी कोळसे
मात्र मनमुराद उकरून काढलेले आहेत. धर्मस्थापना करावी ज्ञातिपुत्र महावीर जिनानें; धर्मस्थापना करावी शाक्य बुद्धानें, आदक्षिणोत्तरध्रुव धर्माचा प्रसार करावा क्षत्रिय सम्राट अशोकानें आणि आमच्या अर्वाचीन स्वामी विवेकानंदानें; धर्मरहस्याच्या नवनीताचे गोळेच्या गोळे चहूंकडे फेंकून मानवी संसार चक्रांतील करकर बंद पाडून जनतेच्या तप्त हृदयाला गारीगार करण्याची पुण्य कामगिरी करावी श्रीमद्रामकृष्ण परमहंसांनी. भिक्षुकशाहीच्या कर्णधार आद्यशंकराचार्यानी काय केले?
तर भिक्षुकशाहीची तळी उचलून धरणारा एक पंथ निर्माण केला. त्या पंथाच्या संन्याशी धर्मानें हिंदुस्थानच्या राष्ट्रीय जीवनाची नौका अखेर निराशावादाच्या खडकावर नेऊन कशी हापटली, ते आजची परिस्थितीच सांगत आहे. धार्मिक काय सामाजिक काय किंवा राजकीय काय कोणतीहि सत्ता भिक्षुकशाहीच्या हाती गेली पुरें कीं तींत अनुदारपणाच्या किड्यांचा बुजबुजाट झालाच म्हणून समजावा. काय म्हणे, ब्रह्म जाणे तो ब्राह्मण! पण आजपर्यंत कोणत्या ब्राह्मणानें आत्मज्ञानाच्या जोरावर ब्रह्मज्ञान प्राप्त करून. घेतले, त्याचा विश्वसनीय दाखला तर कोठेच मिळत नाहीं. उलट एवढे मोठे
ब्रह्मदेवाच्या तोंडातून पडलेले ब्राह्मण
पण त्यांना अध्यात्म विद्येचा गुरूपदेश क्षत्रीयांच्या (The Warrior class had evidently from a very early time produced a number of independent thinkers who were able to grapple with and to hold their own against the prieste, nay, who were superior to them in one subject, namely, in their knowledge of the Atman, the Self. (p. 14) ... The Kshatriyas never surrendered their right to take part in the discussions of the great problems of life and death, and they occasionally asserted it with great force and dignity. (p. 10) - Indian Philosophy "-Max Muller.) पायाचें तीर्थ पिऊन पिऊनच प्राप्त करून घ्यावा लागला. एखाद्या इरसाल पतिव्रतेप्रमाणे ज्या आध्यात्म विद्येनें क्षत्रियांचे वामांक सोडून भिक्षुकशाहीकडे प्रसन्नतेचा एकादा कृपाकटास कपिं चुकून सुद्धा टाकला नाही, स्था भिक्षुकशाहीनें मानव आणि देव यांच्यांमध्ये अडत्येगिरीचा सनदशीरपणा गिरवाया है चमत्कारीक नव्हे काय ?
(११) आंगीमासी खिळलेल्या कारस्थानी वृत्तीच्या जोरावर ज्या वेळी भिक्षुकशाहीला उच्चीचे ग्रह आले आणि आपल्या ब्राह्मण्याचे फाजील स्तोम माजविण्यासाठी त्यांनी (१) वैशंपायनाच्या भारतात भिक्षुकी मताचा उकीरडा ठेंचून भरून त्याचे महाभारत बनविलें, (२) मनु याज्ञवल्क्य पराशरादिकांच्या नांवाच्या शेंदरानी निरनिराळ्या स्मृत्यांना देवकळा आणली, (३) व्यासाच्या गळ्यांत भागवताची धोंड बांधली, आणि (४) ब्राह्मणेतरांना विशेषतः क्षत्रियांना पाण्यापेक्षा पातळ करण्यासाठी पुराणांची गिरणी सुरू केली, त्यावेळच्या या सर्व
भिक्षुकी बायबलांचे पारायण
(The brahmans who compiled the Sanekrit account (of the puranas) could and did fabricate passages portraying the evils of the Kali Age. Dynasties of the Kali Age. p. ziz. Int.
(2) The Mahabharat, Ramayan and the Puranas...... must beused with caution.
Ancient India, by Rapson. p. 70.
(3) There can be no doubt that, originally at least the ancient epice belonged rather to the Kshatriyas than to the brahmans Their religion is that of the kingly caste... At a later date, when the supremacy of the Brahman caste was firmly established, no doubt a more definitely religious tone was given to the epics. Ditto. p. 78) करून त्यांतली प्रत्येक गोष्ट अगदी अक्षरश: खरी मानली तरीसुद्धां त्यांत काय तत्वांश निघतो हे या कलमात आपण त्रोटक रीतीने पाहू, भिक्षुकशाहीची सर्व मदार पुराणावर आणि मनू यज्ञवल्क्याच्या नांवाखाली विकल्या जाणाऱ्या स्मृती नामक पातड्यांवर, ‘पुराणे म्हणजे शिमगा असें कोणी म्हटलें पुरे की आमचे राजकारणकर्तेसुद्धा त्याच्या नावाने शिमगा करू लागतात आणि लोकसंग्रहकार व्यासाला यरवड्याच्या मैदानांत फांसावर चढवून त्याच्याजागी `पिऱ्या म्हारा` ची स्थापना करतात. पुराणें ही ब्राह्मणांनी लिहिलेली आहेत आणि या ब्राह्मणबुवांना आदर वाटणें अंगदी स्वभावसिद्ध आहे; त्यावर कोणाचीच हरकत नाही. आता त्या पूज्य ब्राह्मण-पुराणकारांबध्दल ब्राह्मणपूर्वजांच्या यादीत स्वतःची अक्कल पूज्यत्वास पोचलेल्या वंशजांनी व्यासाच्या ऐवजी पिऱ्या म्हाराची योजना केली, तर त्याबद्दल ब्राम्हणेतरांना सुहेर सुतकाचे सव्यापसव्य कांहींच नाहीं. मात्र, स्वतःच्या पूर्वजांना वार्षिक पिंड तीलोदक देतांना, मध्यंतरी
पिऱ्या म्हाराची स्वारी
लोकसंग्रहाचा पुरावा घेऊन तर्पणोदकाच्या घुटक्यासाठी आ पसरून आली, तर मात्र ब्राह्मणबुवांनाच गोमुत्राच्या गाडग्यामागे आश्रय घेण्याचा अनावस्था प्रसंग येईल, त्याचा बंदोबस्त त्यांनी केला पाहिजे.
आजची स्थिति अशी आहे की पुराणे म्हणजे भिक्षुकशाहीचा देह यमनस्मृति तिचा आत्मा । भिक्षुकशाही व पुराणे यांची ताटातूट करण्याची आमची इच्छा नाहीं; इतकेंच नव्हे तर, पुराणांबद्दलचे आमचे मत अगदी दूर झुगारून देऊन, पुराणांच्याच दुर्बिणींतून भिक्षुकशाही कशी दिसते हे पहाण्याचा पुढे यत्न करणार आहोत, ज्या पुराणांचा मूळ उद्देशच ब्राह्मणांची व त्यांच्या ब्राह्मण्याची तळी शिकस्त तितकी उंच उचलून धरायची, त्या पुराणांच्या अस्सल आधारानेच भिक्षुकशाहीच्या अगदी मुळाला हात घातला, तर त्यांत भिक्षुकशाहीच्या प्रवर्तकांस राग येण्याचे काही कारण नाहीं तुमचेच पुरावे आणि तुमचीच परिक्षा अर्थात् ऐतिहासीक संशोधनाने निश्चित केलेले पुराणाचे खरे स्वरूप आपण अगदी विसरून जाऊन, पुराणे आहेत तशीच खरी धरून चालावयाचे आहे. पुराणे म्हणजे भिक्षुकशाहीच्या त्राह्मणी कादंबन्या, ही गोष्ट सध्यां मुळीच विचारांत घ्यायची नाहीं. पुराणांत जेहत्ते काय सांगितलें आहे की फार प्राचीन काळी या पृथ्वीवर बली नावाचा एक अतुल पराक्रमी, सर्वगुणविद्यासंपन्न असा क्षत्रिय राजा होता. त्याच्या पराक्रमाचा शह प्रत्यक्ष इंद्राला लागला. त्यानें श्रीविष्णूची प्रार्थना करुन बलीच्या शताश्वमेधात विघ्न आणण्याची विनंती केली. कारण बली स्वतःस विभावनाचा सम्राट मानून, शताश्वमेघानें खुद इंद्रालाहि नेस्तनाबूद करून त्याचें सिंहासन घेणार होता. त्याचें ९९ मेध पूर्ण होऊन १०० व्याला सुरूवात झाली होती तोंच श्रीविष्णू
ब्राह्मण बटूचें सोंग घेऊन
बलीच्या यज्ञमंडपति त्याच्या शताश्वमेधाचा संकल्प हाणून पाडण्यासाठी येऊन दाखल झाला. [ श्रीविष्णूनें ब्राह्मणाचे रूप घेतले` यावरून तो स्वतः ब्राह्मण- गुणकर्मतः किंवा जन्मतः नव्हता असें दिसतें : त्याचप्रमाणे क्षत्रियांच्या धार्मिक किंवा राजकीय श्रेष्ठत्वाचा खून पाडण्यासाठी भिक्षुकशाहीचा ब्राह्मणच काय तो वाकबगार, ही गोष्ट देवांनासुद्धा फार प्राचीन काळापासून माहीत होती.] हा वामन बटु अगदी बुटका व अखंड पावलांचा मोहक चेहऱ्याचा व सुकुमार देहाचा होता. [कारस्थानी प्राण्यांची शरीरें अशीच मोहक व सूक्ष्म असतात.] अतिताभ्यागतास निरीच्छ करून सोडण्यांत क्षत्रियांचा बाणा पुराणप्रसिद्धच आहे. त्यांत बलीने यज्ञदीक्षा घेतलेली मग तो या वामनबटूला निरीच्छ केल्याशिवाय थोडाच सोडणार? हे ब्राह्मणा, तुझी काय इच्छा असेल ती सांग, मी ती सर्वस्वी पूर्ण करीन असे बलीने विचारताच वामनबटूनें एक अगदी क्षुल्लक दिसणारी देणगी.
“माझ्या तीन पावलांइतकी जमीन दे मागितली.”
[अरेरे! काय ही पोंचट मागणी ! लक्ष्मी प्रसन्न झाली आणि मागितलें काय? तर मला सोन्याचा सल्ला दे. बलीसारख्या सम्राटापाशी काय आंखुढ तीन पावलांइतकी जमीन मागायची? पण ब्राह्मणाचे मागणे असेच कांहीतरी क्षुल्लक आणि विचित्र असायचें. पण सल्ला मागण्यांतच दात्याच्या सर्वस्यावर हल्ला करून डल्ला मारण्याची भिक्षुकी लीला आतां जशी सर्वाच्या पूर्ण परिचयाची झालेली आहे, तशी ती श्रीविष्णूलाहि चांगलीच परिचित होती म्हणून त्यानें आपली ब्राह्मणी वेषाची भूमिका वठवितांना तीन पावलांइतकी जमीनमागितली, श्रीविष्णूला नटनायक म्हणण्याची सुरूवात याच प्रसंगामुळे तर झाली नसेल ना? केसरीचे संपादक व मराठेशाहीचे शतसांवत्सरीक श्राद्ध घालणारे पुरोहित श्रीयुत नरसोपंत केळकर यानी ज्यांना `चित्पावन राजे` असे नुकतेच आपल्या केसरीत झटलें, त्यांच्या पूर्वजानें छत्रपति शाहूमहाराजाजवळ केवळ छत्रपतीच्या जोड्याची सेवा च मागितली पण अखेर या चित्पावन राजांनी (?) छत्रपतीच्या वंशजांना जोडे मारमारून सातारच्या सिंहासनावरून कसे अलगज उखडून टांकले, तें इतिहासप्रसिद्धच आहे. भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी या सार्थ म्हणीचें अन्वर्थक प्रत्यंतर म्हणजेच केसरीच्या ‘चित्पावन राजांचा इतिहास’ होय.] वामनाची मागणी ऐकून बलीला हसू आले असेल कदाचित आश्चर्यहि वाटले असेल. त्यानें या वेषधारी ब्राह्मण बटूची मागणी मान्य करतांच वामनानें आपला देह आक्राळविक्राळ वाढविला आणि एका पावलाने पृथ्वी व दुसऱ्याने स्वर्ग व्यापून
तिसरे पाऊल कोठें ठेऊं बोल ?
म्हणून बलीला डुरकणी फोडून विचारिलें. बलीनें तात्काळ आपले मस्तक पुढे करून म्हटलें ` येथे ठेव.` तात्काळ बलीच्या मस्तकावर वामनानें पाय ठेऊन त्याला पाताळांत चिणले. झाली. कथा संपली.
या गोष्टीचे तात्पर्य काय? म्हणून भिशुकशाहीच्या पुराणिक बुवास विचारले तर तो ब्राह्मणांच्या सामर्थ्यावर केवढी तरी मैलभर मल्लीनाथी झोडील. ही कथा आहे तशीच गृहीत धरली तरी त्यांत ब्राह्मण्याची प्रौढ़ी कोणत्या मुद्याच्या कोपऱ्यांत लपून बसली आहे ती काही दिसत नाही. वामनानें बलीला पाताळांत दडपून काय मोठा पुरूषार्थ साधला हां त्यानें बलीच्या सिंहासनावर स्वतः बसून पृथ्वीचें राज्य चालविलें असतें, तर तें कांहीतरी स्तुत्य झालें असतें. पण असें कांही त्यानें न करितां उलट पाताळलोकी वामनानें आपण होऊन
बळीच्या दारांशी द्वारपाळगिरी
करण्याचे काम पत्करलें, काय? क्षत्रियांच्या दरवाज्यांतले जोडे आणि पायतणे संभाळण्याकरितांच श्रीविष्णूनें एवढा मोठा वामनावताराचा ब्राह्मणी खटाटोप केला! नुसत्या द्वारपाळाची नोकरीच या ब्राह्मणबटूला पाहिजे होती, तर साध्या लंगोटीइतक्या चिटोऱ्यावरच्या अर्जाने किंवा तोंडी विनंतीनें काय बळीनें ती त्याला दिली नसती ? वामनावताराचे रहस्य आहे कशांत हेंच मुळी समजत नाही. यांत ब्राह्मण्याची थोरवी तर सिद्ध होत नाहींच नाही, पण उलट त्यांच्या बेअक्कलपणाचा दाखला मात्र पटतो. दोन पावलांत पृथ्वी आणि स्वर्ग व्यापून टाकल्यावर तिसऱ्या पावलासाठी जागा देण्याची बलीला अडचण पडेल, ही वामनाची भिक्षुकी अटकळ बलीनें
ठेव माझ्या मस्तकावर पाय
म्हणतांच जागच्याजागी चीत झाली. क्षत्रियांच्या जगप्रसिद्ध उदारमनस्कतेने भिक्षुकशाहीच्या कारस्थानी संकुचित वृत्तीला ठेचून काढले आणि लाथेच्या टांचेने बळीला पातळांत दडपितांच ईश्वरावतार वामनला त्याच पातळांत स्वतःला कायमच्या गुलामगिरीत जखडून पडावे लागलें. बरें ईश्वर अवतार घेतो केव्हा? आणि कशाला? परित्राणाय साधूनाम् विनाशायच दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ यांपैकी कोणत्या महत्कृत्यासाठी देवानें हा वामनाचा ब्राह्मणी अवतार घेतला? बली हा जुलमी राजा (tryant) होता, त्यानें प्रजेचा छळ मांडला होता किंवा तो अधर्मी होता, असें एकहि पुराण सांगत नाहीं, उलट पक्षी त्यांच्या सर्वगुणसंपन्नतेचीच वाखणणी सर्वत्र केलेली आढळते. फार काय पण ज्यावेळी श्रीविष्णूने वामनरूपाने प्रगट झाल्यावर आपल्या चतुर्भुजांतल्या आयुधांना ‘जा बलीचा नाश करा’ असा हुकूम फर्मावला, तेव्हां त्यांनीसुद्धां ‘हे कृत्य केव्हांहि आम्ही करणार नाहीं व तें... शक्यहि नाही’ असा खडखडीत जवाब दिला. इतकेंच नव्हे, तर हजारों वर्षे झाली तरी आजदिनतागायत प्रत्येक वार्षिक दिवाळीच्या प्रतिपदेच्या दिवशी
इडापिडा टळो आणि बळीचें राज्य येवो!
ही कळकळीची प्रार्थना यचावत् हिन्दु ललना करीत असतात. यावरून बळीच्या राज्याची श्रेष्ठता व अनुपमेय चांगुलपणा सिद्ध होत आहे. ज्याचें राज्य येवो, राज्य येवो` असा स्त्रियांच्या याचनेचा टाहो क्षीरसागरांतल्या परमेश्वराच्या कानांवर आचांद्रार्क प्रत्यहीं आदळत आहे, त्या श्रीमान् बळीला पाताळांत दडपिण्याच देवाला काय प्रयोजन झालें? आणि असे करून त्यांत अवताराचा कोणता पुरुषार्थ साधला? यांत काय साधूंचे परिपालन झालें, दुष्कृताचा विनाश झाला, की धर्मसंस्थापना झाली, झाले तरी काय? याचे उत्तर कांहीं नाहीं हेंच द्यावे लागले. बळीच्या क्षत्रिय सिंहासनावर त्याचा मुलगाच बसला. एकदा वामनप्रासादिक ब्राह्मणबच्चा बसला नाही किंवा बाणासुराच्या प्रधानकीची जागाहि एवढ्या मोठ्या ब्राह्माणवतराने एकादा लोकसंग्रही व राजकारणी भिक्षुकास दिली नाहीं बळीला ज्या खाड्यात गाडलें त्या खाड्यांत ईश्वरावतार वामनसुद्धा गाडला गेला. वाहवा रे अवतार ! अवतारच खरा !!
(१२) बळी आणि वामन यांचया पौराणिक झगड्यात ब्राह्मण व क्षत्रिय यांच्या परस्पर मनोवृतीचे चित्र स्पष्ट आणि उठावदार वठलेले आहे. ही स्पष्टता आणि हा उठाव तुलनेनेंच व्यक्त होणे शक्य असल्यामुळे आपण या कलमांत
जरासंधवधाचा इतिहास
त्रोटक रीतीनें पाहूं वामनाने बलीचा नाश करण्यासाठी ब्राह्मणरूप धारण केलें होतें आणि हजारों क्षत्रियांना बंदित टांकून त्यांचा नरमेध करण्यासाचे धाडस करणाऱ्या धाडसी क्षत्रिय जरासंधाला टर टरटर टर उभा चिरून काढण्यासाठी श्रीकृष्ण भीम अर्जुन यांनीही ब्राह्मणरूपें धारण करूनच जरासंधाचा राजवाड्यात प्रवेश केला होता.
परंतु वामनाच्या आणि श्रीकृष्णाच्या वर्णनात आणि मागणीत केवढा जबरदस्त फरक पहा. श्रीकृष्ण भीमार्जुनासह सायंकाळ झाल्यावर भलत्याच मार्गानें जरासंधाचा राजवड्यांत शिरला. त्यांनी स्नातकाचा वेष घेतला होता व सर्वांगावर सुगंधयुक्त गंध लावून पुष्पमाळा घातल्या होत्या. जरासंध एवढा क्रूर, जुलमी व सार्वभौमत्वासाठी हपापलेला क्षत्रिय राजा होता, तरी सत्पात्र ब्राह्मणांचा तो चाहता होता. त्याने या तिघां वेषधारी स्नातकांस उत्तम आगतस्वागत दिलें परंतु जात्याच तो मोठा चाणक्ष असल्यामुळे त्यानें या वेषधाऱ्यांचे ढोंग चटकन ताडलें. जरासंध धिःकारयुक्त वाणीने म्हणाला `ब्राह्मणहो, या लोकामध्यें स्नातकव्रत आचारणारे पुरूष समावर्तनादि कारणावांचून गंधपुष्पें वैगैरे बाह्यालंकार धारण करीत नाहीत, हे मला पूर्ण विदीत आहे. म्हणून मी खात्रीने म्हणतो की खरोखर तुम्ही ब्राह्मण नसून क्षत्रिय आहांत. गंधपुष्पे धारण करून बाह्यत: हें तुम्ही नुसतें ब्राह्मणपणाचे सोंग आणले आहे. या पहा, धनुष्याची दोरी घासून घासून तुमच्या दंडावर पडलेल्या पट्ट्याच्या खुणा तुम्ही खात्रीनें क्षत्रियच आहोत. हे विप्रानो सत्य काय ते सांगा. या जगामध्ये
क्षत्रियांना सत्यापासून शोभा
प्राप्त होते. अहो, तुम्ही चैतकप्राकाराचें शृंग फोडून भलत्याच मार्गानें निर्भयपणे राजरोस येथे, प्रवेश केला, तेव्हां हें असें कपट करण्याचे प्रयोजन कोणते? अहो, ब्राह्मणांचा पराक्रम काय तो विशेषतः वाणीमध्ये; तोंडाचा पट्टा काय तो पाहून घ्यावा, असें असतांना ब्राह्मणशीलाच्या : विरुद्ध वर्तन करून, तुम्ही आपल्या प्रत्यक्ष कृतीनें पराक्रम दाखविलात, याचा ताळमेळ कसा घालायचा?"
श्रीकृष्णार्जुनभीमानी बाह्यत जरी स्नातक वेष घेतला तरी ते जात्याच अस्सल क्षत्रिय असल्यामुळे त्यांच्या हातून नकळत झालेले पराक्रम जरासंधासारख्या जगजेत्या महापुरुषाच्या नजरेतून कसे निसटतील ? त्यावर श्रीकृष्णाने दिलेले सडेतोड उत्तर पहा. श्रीकृष्ण म्हणाला "राजा जरासंधा, आम्ही खरोखरीच स्नातकब्राह्मण (ब्रह्मचिंतन करणारे पुरूष) अहोत. ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या तिघांसहि स्नातकव्रतांचे परिपालन करण्याचा अधिकार आहे. पुष्पें धारण केल्याने विजयलक्ष्मी माळ घालते म्हणून आमच्या शरीरावर या पुष्पमाला शोभत आहेत. क्षत्रियाच्या ठिकाणी जसे बाहूबल असते तसे वाग्बल नसते. जरासंधा, क्षत्रियापासून मोठ्या प्रगल्भ व अघळपघळ भाषणाची इच्छा करण्यापेक्षा उग्र क्षत्रिय तेजाची इच्छा करावी, विधात्याने क्षत्रियांच्या ठिकाणी बाहूमायेंच विशेषेकरून बल ठेविलें आहे, ते बल पहावें अशी तुझी इच्छा असल्यास, ती तुझी इच्छा आज निश्वयानें परिपूर्ण होईल. राजा, धूर्त पुरूष शत्रूगृही आडमार्गाने व मित्रगृही योग्य मार्गाने प्रवेश करतात म्हणून ज्या मार्गाने आम्ही येथे प्रवेश केला, तो राजनीतीच्या त्याप्रमाणे योग्य मार्गच होय. जरासंधा, तू स्वतः क्षत्रिय असून नरमेध करण्यासाठी स्वज्ञातीय क्षत्रियांनाच कोंडून ठेवतोस? क्षत्रियांने क्षत्रियांना यज्ञपशूंची संज्ञा द्यावी, असला हा मूर्खपणा करणारा तुझ्यासारखा तूंच तूं ज्ञातीचा क्षय करण्यास उद्युक्त झाला आहेस असें पाहून, त्या दीन राजांचा मृत्यू चुकवावा व त्यायोगें क्षत्रिय ज्ञातीची वृद्धी करावी, या उद्देशाने जरासंधा आम्ही येथे
तुला ठार मारण्यासाठी आलो आहोत.
स्वजातियांचे संरक्षण करणे हे कर्तव्य मानणारा कोणताही मनोनिग्रही क्षत्रिय अशा समय युद्धास सिद्ध होऊन रणांगणांत देह ठेवण्यास कधीही माघार घेणार नाहीं हे नीट लक्षात ठेव." पुढे भीमाच्या हातून जरासंधाचा वध करवून विजयी श्रीकृष्ण सर्व बंदीवान क्षत्रिय राजांची मुक्तता करून परत आला. या गोष्टी विस्तृत सांगण्याची अवश्यकता नाहीं. मूळ मुद्दा हा कीं वामनानें ब्राह्मणरूपानें येऊन क्षत्रिय बलीजवळ केलेल्या मागणीचा कारस्थानीपणा आणि क्षत्रिय श्रीकृष्णाच्या जरासंधापुढच्या तडफदार स्पष्टस्पष्ट आव्हानाच्या भाषेचा खडखडीतपणा पहा, हाणजे
क्षत्रिय ब्राह्मणांच्या मनोवृत्तींचा भेद
तेव्हांच ध्यानी येईल. भिक्षुकशाहीची आतली गाठ आणि क्षत्रिय वीरांच्या मनाचा निःस्वार्थी मोकळेपणा, पापभिरूत्व आणि अन्यायाविषयीं भयंकर संताप या गोष्टी खुद्द ब्राह्मणी पुराणांवरूनसुद्धा सिद्ध करणारे आणखी असे कितीतरी दाखले देता येतील, पण प्रस्तुत पुस्तकाचा उद्देश काहीं तो नव्हे. अस्सल खराखुरा क्षत्रिय व बनावट किंवा अस्सल ब्राह्मण यांच्या अंतरंगाची कमावणी कस कसल्या मसाल्याची असते, ती किंचित् खुलासेवार पृथःकरणानें आपल्यास पहावयाची आहे.
***
(१३) भिक्षुकशाहीत अनेक दुर्गुण असले तरी त्यांत खुनशीपणा हा प्रमुख दुर्गुण आहे. पुराणांतले सारे ब्राह्मणी पराक्रमाचे इतिहास पहा, त्यांत ब्राह्मणी सामर्थ्यांपुढे क्षत्रियांचा ठिकठिकाणी पाडाव झाल्याचे नमूद करण्याच्या कामी ब्राह्मण संपादकांनी जरी आपली जान जान पछाडली आहे, तरी भिक्षुकशाहीच्या
रक्तांत रसरसणारा खुनशीपणा
त्यांना मुळीच छापविता आला नाही, ही गोष्ट विशेषतः लक्षांत ठेवण्यासारखी आहे. क्रिस्ति शकाच्या पूर्वी ३२१ व्या वर्षी हिंदुस्थानावर राज्य करणाऱ्या सम्राट चंद्रगुप्त मौर्याचा मसलतगार विष्णुगुप्त चाणक्य यानें `कौटिलीय अर्थशास्त्रम् ` नावाचा इंडियन पिनल कोडवजा जो एक उत्कृष्ट ग्रंथ मौर्य साम्राज्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकरिता लिहिला, त्यांत राजानें आपल्या मुख्य पुरोहिताची व दिवाणांची परीक्षा कशी करावी, हें अत्यंत सूक्ष्म दृष्टीने ठरवून लिहिलें आहे. त्यावरून भिक्षुकशाहीच्या उलट्या काळजाची व कृतघ्नपणाची ख्याति क्रि. शकपूर्व ३२१ च्या पूर्वी वरील लोकविश्रुत होती, इतके तरी मान्य करणे भागच पडते. चाणक्य लिहितो:--
पुरोहितमयाज्ययाजनाध्यापने नियुक्तममृष्यमाणं राजा अवक्षिपेत् ।
स सत्रिभिश्शापथ पूर्वमेकैकमात्यमुपजापयेत् -- अधार्मिकोऽयं राजा
साधुधार्मिकमन्यमस्य तत्कुलीनमवरुद्धं कुल्यमेकप्रग्रहं सामन्तमाट
विकमौपपादिकं वा प्रतिपादयामः सर्वेषामेतद्रचते कथं वा तवेति ।
प्रताख्याने शुचुरिति धर्मोपधा । ११० कौ० अ०
भावार्थ:-राजाने आपल्या पुरोहिताला एकाद्या बहिष्कृत मनुष्यास वेद शिकविण्याचा किंवा त्याच्या येथें याज्ञिकी करावयाचा हुकूम सोडावा; तो त्यानें अमान्य केला की त्याला राजानें नोकरीवरून दूर करावें, असें झालें ह्मणजे तो पुरोहित आपल्या कांहीं शास्त्री दूतांच्या मार्फत राजाच्या एकेक अमात्य दिवाणाच्या कानाचा गुप्तपणे चावा घेऊन त्यांना राजाविरुद्ध चिथावण्याची शिकस्त करील. ते त्या दिवाणांना आणा शपथा घेऊन सांगतील की " अहो, हा राजा अगदी अधार्मिक आहे. आपण सगळे मिळून एखादा चांगला धार्मिक राजा (या अधार्मिकाला उखडून टाकून त्याच्या जागी) स्थापन करूं या किंवा याच राजघराण्यांत जन्मलेला एकादा धार्मिक पुरुष, किंवा एकादा बंदीवासांत पडलेला अथवा एकादा शेजारचा नातेवाईक कर्तबगार राजा, एकादा जंगली नायक, फार काय पण एकादा उपटसुंभ या राजाच्या सिंहासनावर आणून बसवूं या. या प्रयत्नाला आम्हां सर्व (पवित्र ?) शास्त्रीमंडळाची पूर्ण संमती आहे. आपले काय मत आहे?" या भिक्षुकी कारस्थानाच्या जाळ्यांत जे जे दिवाण सापडतील ते भ्रष्ट समजावे व न सांपडतील ते विश्वसनीय मानावे. या प्रयोगाला धार्मिक कसोटी` असे म्हणतात.
विष्णुगुप्त चाणक्याची ही पुरोहित ऊर्फ भिक्षुकशाहीच्या स्वभावधर्माची व्याख्या किती समर्पक, किती बिनचुक आणि किती दूरदृष्टीची आहे, याचे प्रत्यंतर पाहू इच्छिणारांनी सांप्रत राजापूराच्या कोल्ह्याची कोल्हापूरच्या राजाविरुद्ध जोरात सुरू असलेली
वेदोक्ताची कोल्हेकुई
ऐकावी अशी शिफारस आहे. या कोल्हकुईत भिक्षुकी खुनशीपणा इतका भयंकर भडकलेला आहे की त्याच्या धगधगीत आंचेपुढे सत्याचें पोलादसुद्धां वितळवून त्याचे पाणीपाणी करण्यासाठी अनेक राष्ट्रीय भिक्षुकानी कंबरा कसल्या आहेत. चाणक्यानें गुप्तपोलीसांचे खाते अत्यंत प्रबळ राखले होते, हें इतिहासख्यातच आहे. गुप्तपोलीसांत काम करणारा पुरुष अगर स्त्री यांना जर कोणता विशेष ‘क्वॉलीफिकेशन’ लगत असला तर तो काळजाची उलटी ठेवण आणि खुनशी पणा हाच होय. खुनशीपणा हा ब्राह्मणवर्गाचा हा जन्मसिद्ध हक्क असल्यामुळे, गुप्त पोलिसांच्या चमूमध्ये ब्राह्मण पुरुषांच्या जोडीने ब्राह्मण स्त्रियांचीही योजना करायला चाणक्य विसरला नाहीं. अध्याय १२ येथे चाणक्य लिहितो, परित्राजिका वृत्तिकामा दारिद्रा विधवा प्रगल्भा ब्राह्मणी अन्तःपुरे कृतसत्कारा महामात्यकुलानि अधिगच्छेत्. चाणक्याचें हे सुत्र वाचले तेव्हां वासुदेव बळवंत फडके नारूच्या आजाराने दरीखोऱ्यांतल्या एका गुप्त ठिकाणी आजारी पडला असता, जेवणखाण व सुश्रुषा करण्यासाठी त्याने भरपूर वेतन देऊन ठेवलेल्या एका ब्राह्मण विधवेने इंग्रजानी जाहीर केलेलें बक्षिस उपटण्यासाठी, वासुदेव बळवंताचा (अगदी स्वजातियाचा) स्वतःच्या डोक्यावर केंस नसतानाहि केसाने गळा कसा कापला. या गोष्टीची आठवण झाली.
असो. या खुनशीपणाबद्दल भिक्षुकशाहीला बुराणकलापासून तो अगदीं आजपर्यंत खरपूस अदली घडत आल्या तरी त्याचा त्याग करण्याची बुद्धी त्यांना होत नाहीं या चिकाटीचा चिकटपणा काय वर्णन करावा याचें पुरातन पौराणिक उदाहरण ह्मणजे परशुरामाचे. या परशुरामाला भिक्षुकशाहीनें वामनाप्रमाणें
दशावतारांतला एक ब्राह्मणी अवतार
बनविला आहे. या अवताराच्या असंबद्ध व सारासारा विचारासहित न पटणाऱ्या ज्या गोष्टी पुराणांत घुसडून दिलेल्या आहेत, त्याबद्दल आह्मी येथे काहीच लिहीत नाही. त्या गृहीत धरूनच या अवताराचा सारांश कशांत निघतो तें पाहूं, परशुरामाने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. [क्षत्रियांशी २१ वेळा करून त्यांचा पराभव केला, असे म्हटले असते तर काही शहाणपणाचे झाले असते व विवेकबुद्धीला पटले असते पण निःक्षत्रिय शब्दाच्या मख्खीवरच या अवताराची सारी इमारत उमारली आहे. ती खाडकन ढांसळेल ना, त्याची वाट काय?] कार्तवीर्याच्या मुलानी परशुरामाच्या बापाचा जमदग्नीचा खून पाडल्यामुळे संतप्त होऊन या ब्राह्मण वीरानें (?) सर्व क्षत्रियांचा निःपात करून समंतपंचक देशांत
क्षत्रियांच्या रक्ताचे प्रचंड पांच डोह
निर्माण करून, त्या रक्तांच्या ओंझळी ओंझळींनी परशुरामाने आपल्या बापाला तर्पणोदक पाजले क्षत्रियांचा निःपात करून मिळविलेली पृथ्वी परशुरामाने क्षत्रियांच्या हत्येचे पातक धुऊन जावे म्हणून (परंतु वास्तविक स्वतः ची राज्य चालविण्याची नालायकी दडविण्यासाठी) कश्यपास दान दिली. (एरवी पृथ्वीनें तरी या विवेकभ्रष्टाला राजा ह्मणून थोडेंच मानलें असतें !) कश्यपानें परत ती क्षत्रियांच्या ताब्यांत राज्य चालविण्यासाठी देऊन, परशुरामाला ‘याउप्पर या पृथ्वीवर तूं राहू नकोस, कोठेतरी दुसरीकडे पृथ्वीवर ज्याचा समावेश होत नाही अशा दुसऱ्या ठिकाणी चालता हो.’ असा हुकूम फर्माविला. त्याप्रमाणे परशुराम एखाद्या बहिकृत रक्तपित्याप्रमाणें महेन्द्र पर्वतावर निघून गेला. आईबापाच्या श्राद्धप्रसंगी परशुरामासारख्या ईश्वरावतारी महापुरुषाच्या आमंत्रणाला मान देणारा एकही ब्राह्मण पृथ्वीतलावर आढळला नाही, ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. ह्मणून या चापधर ब्राह्मणानें क्रोधाने बाण मारून समुद्राला हटविलें आणि चितास्थानी आढळलेल्या कैवर्तकांस (कोळयांस) चित्पावन ब्राह्मण बनवून (यावरून परशुराम जन्मप्राप्त ब्राह्मणाच्या तत्त्वाच्या विरुद्ध होता असे दिसते. नाहीतर त्याने कोळ्याचे ब्राह्मण बनविण्याचा उपव्याप कशाला केला असता ? बरे, कोळ्यांचे ब्राह्मण झाले तरी कसे? आणि कोळ्यांचे जर ब्राह्मण होतात, तर या परशुरामी तत्त्वाविरुद्ध जन्मप्रापत ब्राह्मण्याची टिमकी वाजविणाऱ्या भोरप्यांच्या तांडवनृत्याचा कसाकाय मेळ घालायचा?)त्यांच्याकडून श्राद्धविधी उरकला व समुद्रांतली ‘रिक्लेम्ड लॅन्ड’ त्यांना आंदण दिली, अशी पुराणांत कथा आहे. या कथेवरून (१) राज्य चालविण्याची ब्राह्मणांची नालायकी, (२) परशुरामाचा खुद्द ब्राह्मणांस आलेला तिटकारा, (३) परशुरामाचा भिक्षुकी खुनशीपणा, आणि (४) परशुरामावताराच्या रहस्याचा ब्रह्मघोटाळा, हीं उघड उघड दिसतात. एवढा मोठा परमेश्वराचा अवतार पण त्याला काय या पृथ्वीवर ब्राह्मणी राज्य स्थापन करता येऊ? बरें, क्षत्रियांपासून स्वपराक्रमाने जिंकून घेतलेली पृथ्वी कश्यपाला दान दिल्यावर त्या ब्राह्मणानें तरी सिंहासनारूढ होऊन स्वतःस सार्वभौमत्व घेण्याचा आयता आलेला योग साधून घ्यावा ? तेहि नाहीं त्यानें उरल्यासुरल्या क्षत्रियांना शोधून काढून त्यांच्या हवाली पृथ्वीचें साम्राज्य केलें आणि पृथ्वीवर शांतता नांदावी ह्मणून निरर्थक रक्तपात करण्यास सोकावलेल्या खुनशी परशुरामाला
देखत हुकूम हद्दपारीची शिक्षा
ठोठावली. यावरून परशुरामाचें अस्तित्व पृथ्वीवर किती तापदायक व लांछनास्पद झालें होतें आणि ब्राह्मणाची राज्य चालविण्याची नालायकी किती लोकविश्रुत होती. याचा उलगडा पटतो. अगदी अलीकडच्या परशुरामप्रसादिक `चित्पावन राजा` चा इतिहास का घ्या ना. त्याचाहि मासला हाच याबद्दल अनेक ऐतिहासिक पुरावे आहेत.
त्यांतील एक खाली देतो :
The (Chitpawun) Brahmin is from diet, habit and education, keep active and intelligent, but generally avaricious and often treacher ous. His life, if in public business, must from the system of his Government be passed in efforts to deceive, and detect others in deceiving. Such occupations raise cunning to the place of wisdom, and debase by giving a mean and interested bent to the mind, all those claims to respect and attachment upon which great and despotic power can alone have any permanent foundation. The history of the Mahratta nation abounds with instances of Brahmins rising from the lowest stations to be ministers, and sometimes rulers of a state; but their character undergoes little change from advance ment, and in general, all its meanest features remain; though often leading armies the Mahratta Brahmins, have not with some remarkable exceptions, gained a high reputation for courage; and if arrogant and cruel, they have often merited the charge of being unfeeling and oppressive. (Life of Nana Phadnis by A. Mac Donald. p. 61) असो. परशुरामाच्या बाबतीत पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतो की ईश्वराने हा अवतार घेऊन केलें काय ? जगाच्या संसारांत बॅलन्स ऑफ पॉवर सत्तेचा समतोलपणा राखण्याचीच कामगिरी करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतो. अशी आम्हा हिंदुजनांची समजूत आहे. क्षात्रतेज, बुद्धिमत्ता, वाणिज्य आणि स्वयंसेवा या चार श्रमविभागाच्या तत्वांवरच जगाचा संसार समतोल चालू शकतो. ब्राह्मणांच्या बुद्धिमता शिरजोरपणाचा वाव मिळाला आणि बाकीची तीन तत्वे जर हतबल बनली किंवा क्षात्रतेजाचा कडेलोट होऊन बुद्धिमत्ता वाणिज्यादि तत्वांचा ऱ्हास झाला, तर जगाचा संसार कधीहि सुरळीत चालणार नाही.
बाहुबल बुद्धिमत्ता वाणिज्य व स्वयंसेवा
या प्रत्येक राष्ट्राच्या चार राष्ट्रीय जीवनाच्या प्राणज्योति आहेत. त्यांतील एकहि कमी अधिक होता कामा नये. परशुरामानें तर क्षात्रतेजाची प्राणज्योत अज्जिबात विझवून टाकली आणि जगांतलें उमदें पौरषत्वच खच्ची केलें, यात त्यानें काय शहाणपणा केला? या दुष्ट कृत्यामुळे परशुरामाची किंमत दिल्लीची कत्तल करणाऱ्या पाषाणहृदयी नादीरशहापेक्षां कवडीमात्र अधिक ठरत नाही, मग असल्या उनाड खुनशी मातृघातक्याला ईश्वरावतार बनविणाऱ्या शहाण्यांची तारीफ फक्त तेच शहाणे करू जाणे मानवी समाजांत घातपात करण्यांत निर्ढावलेले कांही खुनशी रुधिरप्रिय राक्षस नेहमीच असतात, त्या अनिष्ट वर्गापैकीच परशुराम हा एक होता. कार्तवीर्याच्या मुलांनी त्याच्या बापाचा खून केला नसता तर परशुरामाला क्षत्रियांचा संहार करून
पृथ्वीला विधवा करण्याची संधि
प्राप्त झाली नसती आणि दशावताराच्या रत्नमालिकेत हा नराधम शंख ओवण्याचे क्षुद्र कृत्य भिक्षुकशाहीला करताहि आलें नसतें. बापाच्या खुनाचा सूड हाणून साऱ्या क्षत्रिय समाजाचा संहार करणे ही सबब ईश्वरी अवताराला काळीमा लावणारी आहे. (क्षुल्लक कारणावरून चवताळून जाऊन मानवी संहार करणारा माथेफिरू परशुराम जर ईश्वरी अवताराच्या लिष्टांत सहावा नंबर पटकावतो, तर पंजाबची कत्तल करणारा महात्मा डायर कोणत्या नंबराचा वारस ठरतो, हें परशुरामभक्त सांगतील काय ?) राष्ट्रांतली मिलिटरी पॉवर नष्ट करून नुसत्या भिक्षुकी अकलेच्या जोरावर पृथ्वीचे साम्राज्य चालविण्याचा मूर्खपणा करणारा कोणी मतिभ्रष्ट या पृथ्वीतलावर जन्मला असेल तर तो एक खुनशी परशुरामच होय आणि याला जर ईश्वरी अवताराच्या कोंदणात बसवायचे असले तर तात्या भिल्ल, वासुदेव बळवंत, चिंतामणराव पटवर्धन, चाफेकर बंधु, कान्हेरे या महात्म्यांनाहि अवतारी समजून दशावताराची यादी शतावतारापर्यंत खुशाल फुगविली तरी त्याबद्दल भिक्षुकशाहीचे कान उपटायला परमेश्वर केव्हांहि येणार नाहीं. एवढे आम्ही आश्वासन देतो. असो. देवाने हा परशुरामी अवतार घेतला कशाला? कार्तवीर्य सहस्त्रार्जुनाला ठार मारायला? त्यानें काय देवाचे घोडे मारले होते, की तो जरासंधाप्रमाणे क्षत्रियांना बंदीत टाकणारा होता किंवा रावणाप्रमाणे देवांना रस्ते झाडावयास लावणारा टायरन्ट होता ? मुळीच नाही. सहस्त्रर्जुनासारखा सर्वगुणसंपन्न व त्रिलोकमान्य राजा याचा तोच, असे पुराणांत ठिकठिकाणी वर्णन सापडते.
सहस्त्रार्जुनाची निंदा करणारें एक अक्षरसुद्धा खुद्द ब्राह्मणी पुराणांत आढळत नाहीं. साऱ्या जगाच्या इतिहासांत सहस्त्रार्जुनाला तोड द्यायचीच तर ती बळीराजाचीच होय. अशा या त्रिभुवनप्रिय नृपतीला ठार मारण्यासाठी ईश्वरानें अवतार घ्यावा ही गोष्ट
परमेश्वराच्या ब्रीदाला काळीमा
फासणारी नव्हे काय ? परशुरामाचा आणि सहस्त्रर्जुनाचा खटका कां उडाला? तर म्हणें जमदग्नीच्या आश्रमांतली कामधेनू त्याने बळजबरीने नेली. वशिष्ठ आणि गाधिजराजा (विश्वामित्र) यांच्यामध्ये कामधेनूहरणाचा झगडा उडाल्याची जी हकिकत पुराणांत दिलेली आहे, त्याच हकिकतीची हुबेहूब नक्कल-अक्षरक्ष:- कॉपी टु कॉपी आणि माशी दु माशी परशुराम आणि सहस्त्रार्जुनाच्या झगड्याच्या प्रसंगी वर्णन केलेली पुराणांत आढळते. ही खरी को ती खरी, हा याद जरी सोडला, तरी त्यांत पुराणकारानें पुढच्या आख्यानांत थोडा भेद दाखविला आहे. तो एवढाच की वशिष्ठ विश्वामित्राच्या नाटकांत प्रत्यक्ष कामधेनूनें आपल्या
आंगापासुनि केले प्रगट तिनें म्लेंच्छ यवन शबर शक || बळ उडविलें तिहीं खगपतिपक्ष्यांनी जसे सहज मशक ||
आणि परशुरामाच्या नाटकांत पुराणकाराला ईश्वरी अवताराचे एक सोंग पौराणिक रंगभूमीवर नाचायचे होते म्हणून त्याने ‘आंगापासूनि शबर शक प्रगट’ करण्याची कामधेनूची देवी शक्ति लंजूर पाडून, तिला पांजरपोळातल्या एकाया खल्लड गाईप्रमाणे सहस्त्रार्जुनाच्या दाव्यांत गुपचूप मान अडकवून त्याच्या गोठ्यात जाण्यास भाग पाडले आहे. बाकी दोन्ही नाटकातले प्लॉट एकच सहस्त्रार्जुनाच्या वेळीच कामधेनुहरणाच्या क्षुल्लक सबबीवर ज्या ईश्वराला अवतार घेण्याची एवढी उतावळी झाली. तोच ईश्वर वशिष्ठाच्या कामधेनूवर विश्वामित्राने हात टाकला तेव्हां काय गांजाची चिलीम ठासून तर्र पडला होता, की एखाद्या वॉर हॉस्पिटलमध्ये डेड सोल्जरांच्या लिष्टांत अडकला होता, की पेशवाई रमण्यांत पुढे लागणाऱ्या ब्राह्मण भोजनाच्या पत्रावळी आगाऊच शिवण्यांत गुंतला होता? काय करीत होता काय? जें कारण एकदा परमेश्वरी अवतारास कारणीभूत होते, तेच कारण दुसऱ्या तसल्याच प्रसंगी का होऊ नये? परंतु अवताराची यादी हवी तितकी फुगविण्याचा कृतसंकल्प केलेल्या भिक्षुकशाहीला एवढा तारतम्यभाव कोठला उरणार! बलीच्या बाबतींत ईश्वरी अवताराचे एखादें कारण कोनेकोपरे धुंडाळून काढलेच तर शताश्वमेधाच्या सांगतेने तो इंद्रपद पटकाविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून होता, हे तरी सापडेल, पण सहस्त्रार्जुनाच्या बाबतीत तेंहि नाही. कामधेनूच्या हरणानंतर काही बोलाचाल होऊन सहस्त्रार्जुनाच्या पुत्रांनी जमदग्नीला ठार मारले आणि रेणुकेवर २१ वार करून तिचाहि मुरदा पाडला. या गोष्टीची तक्रार या सोज्वळ परशुराम ब्राह्मणानें सहस्त्रर्जुनाकडे केली असती तर न्याय अन्यायाची मीमांसा करून त्या सत्यप्रिय आणि न्यायप्रिय क्षत्रिय नृपतीने आपल्या अपराधी पुत्रांस खात्रीने फासावर चढविलें असतें, सत्याकरिता व न्यायाकरितां क्षत्रिय राजांनी केलेली असलीं हजारों आत्मयज्ञार्थी कृत्ये ब्राह्मणी पुराणांतच नमूद आहेत. पण खरें म्हटलें तर परशुरामाची स्थिति
ना पुरुष ना नारी
या म्हणीप्रमाणे ना ब्राह्मण ना क्षत्रिय अशी अधलीमधलीच होती. आईबापाचा खून झाल्यावर, आपण परमेश्वराचे मोठे अवतार आहोत, धर्मसंस्थापनार्थाय आपला जन्म आहे, वगैरे सर्व उदात्त गोष्टी पार विसरून जाऊन कामाठपुऱ्यांतल्या एखाद्या माथेफिरूप्रमाणे या ब्राह्मणी अवताराने सर्रास क्षत्रियांची कत्तल करण्याचा संकल्प करून, त्या संकल्पाची पहिली भवानी सहस्त्रार्जुनासारख्या लोकप्रिय चक्रवर्ति क्षत्रिय राजाच्या खुनानें केली. साऱ्या त्रिभुवनाला अत्यंत प्रिय असलेल्या राजदंडधारी पुरुषाचा खून करणे, हें केवढे चिळस आणणारे दुष्कृत्य आहे, याची या माथेफिरूला कल्पना होऊ नये, येथेंच परशुरामाच्या भिक्षुकी चारित्र्याची खरी मेख आहे. शिवाय, ब्राह्मणांच्या हातीं क्षत्रियांची क्षात्रविद्या गेली असतां पृथ्वीवर केवढा हाहाकार उडतो. याचाहि दाखला या परशुराम चरित्रावरून चांगला पटतो, स्वतःच्या स्वार्थाला चिमटा बसतांच किंवा स्वत: चें कांही नुकसान होताच, पाठीमागचा पुढचा काहीहि विचार न करितां एखाद्या क्षुद्र माथेफिरूप्रमाणे
राजदंडधारी राजांचे खून
करण्याची ही घातकी परंपरा हिन्दुस्थानांत सुरू करणाऱ्या परशुरामाला ईश्वरी अवतार मानणें, म्हणजे अवतार-कल्पनेची शुद्ध बीभत्स विटंबना होय. बरे, क्षत्रियांचा संहार करून परशुरामानें अखेर मिळविले काय? पांडवांनी कौरवांचा संहार करून अखेर गतभर्तृकांचेच राज्य मिळविलें. अहमदशहा अबदाल्लीनें पानपतास
मराठेशाहीच्या तीन लाख बांगड्या
फोडून अखेर आपल्या स्वकीयांची श्राद्धतर्पणे घालीत घालीतच खैबर घांटाची गाठ त्याला घ्यावी लागली. हा काय विजय झाला? याला विजयच म्हणायचे तर प्राणघातक विजय म्हणा; पण हा काही विजयन परशुरामाने क्षत्रिय संहार करून गतभर्तृका पृथ्वी हस्तगत केली. पण त्याला ‘नको ही ब्याद’ म्हणून कश्यपाच्या पदरात टाकावी लागली आणि अखेर कश्यपाच्या ‘समरी आर्डर ‘बरहुकूम त्याला मानवी समाजातून एखाद्या रक्तपित्याप्रमाणे कायमचें उठून जावे लागले. महेन्द्र पर्वतावरच्या ह्या एकलकोंड्या चिरंजीव समाज विध्वसकांचे ईश्वरी अवताराचे हे पर्यवसान पाहून प्रत्यक्ष ईश्वरसुद्धा ओक्साबोक्सी रडत बसला असेल !!!
* * * *
(१४) हिन्दुस्थानच्या इतिहासांत भिक्षुकशाही आणि खुनशीपणा या जोडप्याच्या अनेक विचित्र लीला फार प्राचीन काळापासून कुप्रसिद्ध आहेत. हे जोड़पें एकमेकांत इतकें समरस होऊन गेलेले आहे की मिक्षुकशाही म्हणजे खुनशीपणा आणि
खुनशीपणा म्हणजेच भिक्षुकशाही
असा शब्दप्रयोग वाङ्मयांत कोणी केल्यास तो फारसा बेकायदेशीर किंवा ब्येव्याकरणशीर होईलसे वाटत वाटत नाही. ही खुनशीपणाची परंपरा कदाचित परशुरामाच्या महाकृपेचें फळ असावे असे वाटते. निदान क्षत्रियांना सदैव पाण्यांत पहाण्याची निकी प्रवृत्ति तरी येथपासूनच निर्माण झाली. असे गृहित धरण्यास काही हरकत नाहीं. परशुरामाच्या अवतारावर मल्लीनाथ्या झोडणा ग्रंथाचा प्रसार झाल्या दिवसापासून क्षत्रियांचा द्वेष हा
ब्राह्मणांचा जन्मसिद्ध हक्क
किंवा ब्राह्मण्यांचे उत्कृष्ट चिन्ह होऊन बसले आहे. इतकंच नव्हें तर आम्ही एकदोन पावलें पुढे जाऊन हातों की ज्याच्यावर भिक्षुकशाहीचा परशुरामी डोळा वळेल, त्याने बिनचुक आपल्या क्षत्रियत्वाची खूणगाठ मारावी, मग त्याच्या टाळक्यावर जन्मलिखित कोणत्याहि जातीची पाटी मारलेली असो.
ब्राह्मण ज्याचे द्वेष्टे तो क्षत्रिय
हा एक आता शाश्वत नियमच होऊन बसला आहे. अमक्यातमक्या ठिकाणी हल्ली ‘ब्रह्मद्वेष’ फार माजला आहे. अर्शी वाक्यें अलीकडे बऱ्याच ठिकाणी वाचनांत येतात. बहाद्वेष म्हणजेच ब्राम्हणद्वेष अशी या लिहिणारांची भावना असते. पण ब्रह्मद्वेष म्हणजे ब्राम्हणद्वेष हा अर्थ या कलमकसायांनी कोणत्या शब्दकोशांतून काढला नकळे! ब्रह्म म्हणजे ब्राम्हण ? आणि ब्राह्मण म्हणजे ब्रम्ह? परब्रम्ह? छान व्यात्पत्ति शोधून काढली. ब्र -म्ह -द्वे- ष म्हणजे ब्रम्हाचा द्वेष-द्रोह तो ब्रह्माद्रोह, आणि
ब्रम्हद्वेष करणारे ते ब्राह्मण
असा अर्थ केला तर त्याला पुराणांचा व इतिहासाचा काही भरपूर पुरावा तरी मिळेल, परंतु ब्रह्महेष म्हणजे ब्राह्मणद्वेष असा नुसता शब्दप्रयोग करून ब्राह्मण कांही ब्रह्मत्वास पोहचणार नाहीत | आजपर्यंत ब्रह्माचा काय किंवा चक्रवर्ति राजाचा काय द्रोह करण्यात ब्राह्मणांनीच आघाडी मारलेली आहे. याची उदाहरणे खुद्द ब्राह्मणी पुराणातून व इतिहासांतून हवी तितकी काढून दाखविता येतील क्षत्रियांचा, क्षेत्रिय सत्तेचा म्हणजेच राजदंडधारी राजांचा राजद्रोह आजपर्यंत ब्राम्हणांनी केला आहे. त्याच्या शतांशाने सुद्धां क्षत्रियांनी ब्राह्मणांचा द्वेष केलेला नाही. उलट भिक्षुकशाहीच्या सर्व अवगुणांना डोळ्याआड करून वेळोवेळी सत्पात्र व सज्जन ब्राह्मणांच्या मध्यस्थीने क्षत्रीय राजांनी ब्राह्मणास सन्मानपूर्वक जवळ केल्याचे दाखले इतिहासात पदोपदी आढळतात. याचे एकच उदाहरण आपण केल्याचे कान्यकुब्जाधिपती (इ.स. ६१०-६५०)
श्रीशिलादित्य हर्षवर्धन राजा
त्यांचे घेऊ. हा क्षत्रिय राजा जरी बुद्धानुयायी होता, तरी इतर सर्व धर्मपंथांना त्याचा भरपूर आश्रय असे वेदानुयायाचा त्याच्या दरबारांत बौद्ध भिक्षूच्या तोडीनेच सन्मान होत असे. यानें आपल्या साम्राज्यांत प्राणिहत्या कायद्यानें मना केली होती आणि कोणी लपून छपून ती केल्यास त्या अपराध्याला देहान्त शिक्षा फर्माविली जात असे. हर्षवर्धनाने ठिकठिकाणी हॉस्पिटलें, धर्मशाळा व मठ बांधले होते. य बौद्ध भिक्षूंच्या स्वाध्यायांत अडचण येऊ नये म्हणून त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था चोख लावून दिली होती. दरसाल हा क्षत्रिय सम्राट आपल्या राजधानीत एक धर्मपरिषद भरवून, स्वराज्यातल्या हजारों श्रमणांस व ब्राह्मणांस आपल्यासमोर धर्मतत्वांची चर्चा व वादविवाद करण्यास सन्मानपूर्वक बोलावीत असे. एकसाल त्याने प्रसिद्ध चिनी प्रवाशी व बौद्धधर्ममार्तण्ड हुएनसंग यालाहि या परिषदेत आमंत्रण दिलें गंगानदीच्या दक्षिणतटाकी भला मोठा टोलेजंग परिषदमंडप उभारला. देशोदेशचे वीस राजे आपल्याबरोबर अनेक विद्वान् श्रमणांस व ब्राह्मणांस बरोबर घेऊन परिषदेला हजर होते.
सर्व पंडितांना निरनिराळी प्रशस्त आसने मांडलेली होती व स्वतः करिता हर्षराजानें एक उच्च सिंहासन मांडले होते. हर्षराजा बुद्धधर्मी असल्यामुळे वैदिक ब्राह्मणांपेक्षा बौद्ध श्रमणांकडे त्याचा ओढा विशेष असल्यास त्यांत काही नवल नाही. त्याने दररोज उत्तमोत्तम अन्नाचे शिधे व दक्षिणा निमंत्रित श्रमणांस देण्याची सुरुवात केली. हे पाहून वैदिक ब्राह्मणांच्या वैषम्यांत पुराणप्रसिद्ध खुनशीपणाचा वडवानळ प्रदीप्त झाला. ताबडतोब हे सर्व वैदिक धर्ममार्तण्ड एकत्र होऊन त्यांनी एक गुप्तकट केला आणि
परिषदेच्या भव्य मंडपास आग
लावण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने हा डाव फसला व कांहीं ब्राह्मण पकडले गेले, गुप्तकटाचा हा पहिला पेंच फसतांच या धर्ममार्तण्डांनी एक खुनशी इसम भावाने मिळवून त्याच्याकडून हर्षवर्धनाचा खून करविण्याची योजना केली. राजाचे सुदैव म्हणून खुनी इसमाच्या शस्त्रप्रहाराचा तडाखा बसण्यापूर्वीच सावध होऊन तो मोठ्या शिताफीनें निसटला व खुनी इसम पकडला गेला. अर्थात् त्यानें
धर्ममार्तण्डांच्या गुप्तकटाचा स्फोट
केला. हर्षवर्धनाने या भाडोत्री खुन्याचा भाडोत्रीपणा लक्षात घेऊन त्याला क्षमा केली परंतु आपल्या साम्राज्यातल्या सर्व वैदिक ब्राह्मणांना ताबडतोब द्ददपार केले, वाचकहो, ही कादंबरी नव्हे, हा इतिहास आहे, या मासल्याचे अनेक निर्घुण खुनशीपणाचे ब्राह्मणी प्रकार इतिहासांत मोजता येतील इतके आहेत, त्यावरून भिक्षुकशाहीच्या कारस्थानी प्रवृत्तीची चटोर जिमली राजकीय रक्तासाठी कितपत लालचटलेली असते, याची आपण कल्पनाच केलेली बरी! असल्या या समाजघातकी राजद्रोही प्रवृत्तीचा आद्यप्रवर्तक जो परशुराम त्याला ईश्वरी अवतार च कुलदैवत ठरविणाऱ्यांचची धन्य असो !!
* * * *
प्रकरण ४
विवेकाला चारी मुंड्या चीत
[१५] आमच्या मर्ते चातुर्वर्ण्य व्यवस्था ही शब्दयोजनाच चुकीची आहे. त्याऐवजी चतुर्वर्ग व्यवस्था ही शब्दयोजना काहीतरी सारासार बुद्धीस व इतिहासास पटणारी आहे. वर्णावरून जाती ठरविल्या गेल्या असाव्यात, असे दिसत नाहीं. निदान हिंदुस्थानांत तरी आर्य आणि अनार्य अथवा गोरे आणि काळे हे दोनच भेद प्राचीन इतिहासात दिसतात. रंगावरूनच जाती ठरल्या असे मानले तर चाराच्या ऐवजी दोनच जातीचे अस्तित्व सिद्ध मानणे प्राप्त आहे आणि जगाच्या आजच्या संसारातहि हाच
काळ्या गोऱ्यांचा झगडा
चालू मन्वंतरांतील इतिहास बनवीत आहे. क्षत्रिय ब्राह्मण वैश्य आणि शूद्र या चार वगांची उत्पत्ति किंवा उपपत्ती वर्णात किंवा रंगात सापडणे शक्य नाहीं. मद्रासचे श्रीयुत आर. शामाशास्त्री यांनी जातींची उत्क्रांति` (The Evolution of caste ) नामक पुस्तकांत (पृ. ४४) असें विधान केले आहे की " निरनिराळ्या वर्गाच्या कपड्यांच्या निरनिराळ्या रंगावरून वर्णावरून वर्ण शब्दानें पूर्वी लोकांचे वर्ग समजले जात असावे. ब्राह्मणांचा पेहेराव पांढऱ्या रंगाचा, क्षत्रियांचा तांबडा, वैश्यांचा पिवळा आणि शूद्रांचा काळा या रंगावरूनच पुढे बुद्धोत्तरकाळच्या वाङ्मयांत जातीचा नामनिर्देश होत आला. परंतु या चार वर्गाच्या लोकांना असले निरनिराळ्या रंगांचे युनिफॉर्म पेहराव करण्याचें कारण काय झालें असावें, याचे ऐतिहासिक अनुमान मात्र शास्त्रीबुवांनी दिलेलें नाहीं. अर्थात् पेहरावाच्या रंगावरून जाती ठरविण्याचा हा तार्कीक उपक्रम मुळींच ग्राह्य धरता येत नाहीं, मुसलमानांच्या अमदानीपासून पांढरपेशे असा एक शब्द हिंदूतील उच्च संस्कृतीच्या वर्गाला उद्देशून योजण्यांत आलेला आहे. तथापि या योजनेंत जातिवैशिष्ट्याची कल्पना मुळीच नसून संस्कृतिवैशिष्ट्यच विशेषतः दृग्गोचर होते. आजलाहि उत्तर हिंदुस्थानातले बहुतेक सर्व लोक
पांढऱ्या पेहरावाचे पांढरपेशेच
आहेत, म्हणून ते सर्वच कांहीं ‘ब्राह्मण’ लेबलाचे हकदार नाहीत. शिवाय पांढरपेशे शब्दाप्रमाणे तांबडपेशे, पिवळपेशे किंवा काळपेशे हे शब्द ज्याअर्थी कोणच्याहि वाङ्मयात किंवा कोणच्याहि प्रांताच्या व्यावहारिक भाषासरणीत आलेले आढळत नाहीत, त्याअर्थी पेहरावाच्या वर्णावरून (`मनुस्मृतीच्या कर्त्याला ‘वर्ण’ व ‘जाति’ या शब्दातील भेद जरी कळत होता आणि मनुष्यात चारच वर्ण आहेत. हे जरी त्याने ठिकठिकाणी ठासून प्रतिपादन केलें आहे तरीसुद्धां अध्याय १० श्लोक ३२ येथे ‘वर्णान्पचदशैव’ असा शब्दप्रयोग करून वर्ण शब्दाच्या अर्थाचा ब्रह्मघोटाळा करून ठेवला आहे. तो मात्र पाहण्यासारखा आहे.)
वर्ग ओळखले जात असत, या विधानाला शुद्ध तर्काशिवाय कसलाहि आधार दिसत नाही. तथापि पेहरावाच्या रंगापेक्षा जर कातडीच्या रंगाकडे आपण वळलो, तर कदाचित् चतुर्वर्ण शब्दाच्या व्युत्पत्तीच्या काहीसे जवळ येण्याचा संभव आहे. एकंदर जगांतील मानवी समाजांत मुख्यत्वेंकरून चार रंगांच्या कातडीचे लोक आढळतात :- (१) आर्य - हे साधारणरीत्या गोऱ्या वर्णाचे व उंच असतात; (२) मांगोलियन - हे पिवळसर रंगाचे असून मध्यम उंचीचे असतात. (३) द्रविड - काळसर वर्णाचे, फेफट्या फुगीर नाकाचे व साधारण मध्यम उंचीचे असतात; आणि (४) नीग्रो - पूर्ण काळया रंगाचे असतात. परंतु या चार मुख्य विभागांना आमच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेत आमचे वेदोनारायण कांहीं सामील करीत नाहींत आणि वर्ण म्हणजे रंग हा अर्थहि ते अमान्य करून वर्ण म्हणजे जाती अशा मतलबी अर्थाच्या धाबळीखालीच घुंगट मारून बसतात. वरील चार मुख्य वर्गातील नंबर २ व ४ हे हिंदुस्थानाबाहेरचे आहेत आणि
हिंदुस्थान म्हणजेच सारें जग
या संकुचित कल्पनेच्या घोटाचा लोटा पचविणाऱ्या आमच्या स्मृतिकारांना एखादा बाबरओंठ्या काळा नीग्रो चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या क्षेत्रांत आलेला कसा खपेल बरें?
कृत त्रेता आणि द्वापार ही युगे हिंदुस्थानांतच झाली. हिंदुस्थानाबाहेर नव्हे ! मच्छ कच्छ वराहादि अवतार झाले, तेहि येथेंच: युरोप अमेरिकेत नव्हे! कारण -
चत्वारि भारते वर्षे युगानि कवयोऽब्रुवन्।
कृतं त्रेता द्वापरश्च कलिश्चान्यत्र न क्वचित् ॥
हा पडला आमच्या धर्मशास्त्राचा (?) पुरावा येऊनजाऊन सर्वांची उडी आपले आर्यवंशजत्व सिद्ध करून दाखविण्याकडे, परंतु आर्यांचे इतिहासप्रसिद्ध गुणधर्म तर राहू द्याच, परंतु त्यांच्या कातडीचा रंगसुद्धा आजला हिंदुस्थानांत कोठे दिसत नाही. समाजशास्त्राची रंगाची व अवयव मापनाची कसोटी लावतांच आमच्या वेदोनारायण वर्गांतील शेंकडा ९५ लोक अनार्याच्या किंवा भेसळीच्या कोटींत खडाखड खेचले जातील. यांत मुळीच संशय नाहीं. जी गोष्ट वेदोनारायण वर्गाची तीच इतर वर्गांची, हें सांगणे नकोच, वर्णसंकराचा बागुलबुवा दाखवून वेळी अवेळी कोल्हेकुई करणाऱ्यांनी आपल्या दांभिकतेच्या धाब ळीचा बुरखा किंचित् बाजूला सारून, इतिहासाच्या सहाय्याने आपल्या
आंगांतील रक्ताचें पृथःकरण
करून पहावे, अशी शिफारस आहे. वास्तवीक वर्णसंकर अत्यंत प्राचीन काळीच होऊन बसला आहे, नित्य होतच आहे आणि कोणी कितीहि जरी सोवळेपणाची काटेरी कुंपण नेसून मुकट्या धाबळ्यांच्या पायघड्यांवरून चालत असला, तरी वर्णसंकर असाच पुढे होत राहणार. वेद, उपनिषदें, स्मृत्या, पुराणें ही जशी अनादिसिद्ध मानण्याचा भिक्षुकी संप्रदाय आहे, त्याचप्रमाणे
वर्णसंकर हा अनादिसिद्ध व स्वयंभू
आहे, हे समाजशास्त्राच्या व इतिहासाच्या आधाराने सिद्ध करता येणें शक्य आहे. वेद उपनिषदें यांतहि संकर झाल्याशिवाय राहिला नाहीं. मग पुराणादि स्मृत्या सध्या अकरमाशा भेसळीच्या आढळल्यास त्यांत आश्चर्य मानण्याचे काय कारण ? उत्तर हिंदुस्थानांतले वक्रतुंड महाकाय ब्राह्मण किंवा मिरज जंक्शनपासून पुढे करवीर इलाख्यांत व मद्रासकडे आढळणारे काळेकभिन्न कुरूप ब्राह्मण जर पाहिले, तर त्यांनी होऊन मी ब्राह्मण असे सांगितल्याशिवाय कोणाची खात्री पटत नाही. मिरज करवीरचे ब्राह्मण तर रंगारूपाने थेट कोकणातल्या कुणब्यांपेक्षाहि गलिच्छ आणि गचाळ दिसतात. आतां यांच्या बाबतीत वर्णाची कसोटी कशी व कोठे लावायची हे समजणे कठीण आहे. पांडवांच्या काळी पांडवांमध्येच वर्णसंकर झालेला होता. खुद पांडव हीच उघडउघड नियोगाची प्रजा, भारतकर्ते व्यास, श्रीकृष्ण, अर्जुन, द्रौपदी ही सर्व काळी कुळकुळीत होती. वर्णसंकराबद्दल प्रत्यक्ष धर्मानंच नहुषापुढे जबानी दिली आहे की “संकरात्सर्ववर्णाना दुष्परिक्ष्येति मे मतिः” - सर्व वर्णाचा संकर झाल्यामुळे निरनिराळ्या जातींची परीक्षा करिताच येत नाहीं. या मागील गोष्टी सोडून दिल्या आणि अगदी अलीकडचा एकच हजार वर्षांचा इतिहास घेतला तरी काय दिसते? या काळात हिंदूंच्या जाती व पोट जाती निरनिराळ्या अलग सवत्या सुभ्याप्रमाणे पोलादी सिमेंटाच्या तटबंदीत जाम जखडून ठेवल्या गेल्या तरीहि त्यांत रक्ताची भेसळ झाल्याशिवाय राहिली नाहीं. अनेक शतकें सुरु असलेली असंवर्ग विवाहाची पद्धति हिंदूनी अमान्य ठरविली, तरीसुद्धां निरनिराळ्या वर्गातल्या लोकांच्या कातडीचा रंग आणि चेहरेपट्टी यांत भयंकर संकर झाल्याचे व सध्याहि होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दक्षिणेकडे मद्रास इलाखा पहा. तिकडे
आर्यब्राह्मण आणि अनार्यब्राह्मण
असे दोन भेद आढळून येतात. शुद्ध आर्य ठशाचे ब्राह्मण कोणते आणि उग्र चेहऱ्याचे, भसाड्या फटफुगीर नाकपुडीचे अनार्य द्रविडी ब्राह्मण कोणते हे कोणीहि तेव्हाच ओळखू शकतो. या दोन भेदांवरून प्राचीन जगज्जेत्या आर्यांच्या नसांतील रक्त सांप्रत किती भ्रष्टावस्थेत संकरपूर्ण झालेलें आहे. हें स्पष्ट कळून येते.
माणसांनी आपल्या चलाख बुद्धीसामर्थ्याच्या जोरावर बिनतारी तारायंत्र, गगनकटाह फोडून पार अंतराळात उड्डाण करून जाणारी विमाने किंवा मंगळताऱ्यांवरील लोकांचा पृथ्वीवरील लोकांशी दळणवळणाचा प्रघात शोधून काढला, तथापि विवक्षित ठशाची माणसें निर्माण करण्याची कला मात्र त्यांच्या हातांत नाही. अर्थात् मद्रासकडच्या ब्राह्मण जातींच्या चेहऱ्यांवर ज्या अर्थी मिश्र अनुवंशिकत्वाचीं चिन्हें स्पष्ट दिसतात, त्याअर्थी त्यांच्यांत केवढा रक्तसंकर झाला असावा, याची कल्पनाच करणे बरे हाच नियम थोड्याफार फरकानें हिंदुस्थानातील सर्व ब्राह्मण वर्गाला लावला म्हणजे त्यांच्या नामधारी ब्राह्मण्याची, त्यांच्या सोवळ्या पुराणप्रिय मनोवृत्तीची आणि त्यांच्या अनुवंशिक संस्कार-शुद्धतेची करावी तितकी कींव थोडीच ज्या अनुवंशिक संस्काराचा नगारा ते आज मोठ्या दमादमाने बदडीत असतात. तोच नगारा आज साऱ्या जगाला धडकाऊन जाहीर करीत आहे की अनुवंशिक संस्कृतीची परंपरा व रक्तशुद्धी जर अभ्रष्ट राहिली असती तर प्राचीन आर्याचा वर्ण व चेहरेपट्टी आणि सांप्रतच्या आर्यत्वाभिमानी हिंदी ब्राह्मणांचा वर्ण, चेहरेपट्टी व शरीररचना यात एवढा विपर्यासी भेद पडला नसता. तो भेद ज्याअर्थी पडला आहे त्याअर्थी त्यांच्या
रक्तांत जबरदस्त भेसळ
झालेली आहे, हें निराळे सांगण्याची आवश्यकता नाही. प्राचीनकाळचे जगज्जेते आर्य गोरे होते. आणि हिंदुस्थानातील मूळ रहिवाशी लोक काळे होते. जे लोक जित लोकांना नेहमीच तिटकाऱ्याने पाहतात व त्यांचा संसर्गहि आपणास होऊ देत नाहीत. हे चालू काळच्या इतिहासावरूनसुद्धां प्रत्येकास समजून येणार आहे. काळा आणि गोरा हा वर्णभेद पुसला जाणे जवळजवळ अशक्य आहे. वर्णभेद किंवा कलर प्रिज्युडिस हा प्राचीन काळाप्रमाणेच चालू मन्वंतरांतील इतिहासाचा लेखक बनला आहे. हिंदुस्थान घ्या, युरोप घ्या, अमेरिका च्या किंवा सुप्रसिद्ध नाठाळ आफ्रिका घ्या, त्यांतसुद्धा जित आणि जेते, गुलाम आणि स्वतंत्र किंवा काळे आणि गोरे हा भेद प्राचीन आर्याच्या व अनार्यांच्या भेदाइतकाच तीक्ष्ण असलेला आढळतो. अर्वाचीन पाश्चिमात्य गोऱ्या आर्यांना हिंदी काळ्या आदमीचा तर इतका तिटकारा वाटतो की आपल्या मुलाबाळांना
हिंदुस्थानच्या काळ्या हवेची दृष्ट
लागून त्यांच्या गोऱ्या कातडीत तिची छटा उमटू नये म्हणून ते आपल्या गरोदर पत्न्यांची बाळंतपणासाठी विलायतेस रवानगी करतात. इतकेंच नव्हे तर संस्कृतीची व पराक्रमाची शर्यत जिंकून, त्यांच्या मांडीशी माडी लावून बसणाऱ्या एशियाटिक जपानच्या पिवळसर वर्णाकडेहि ते नेहमी साशंक नजरच फेंकीत असतात. याचे कारण उघड आहे. जगांत मुख्य वर्ण दोन काळा आणि गोरा, तांबडा पिवळा बदामी (गव्हासारखा) वगैरे रंग हे मिश्रणाचे परिणाम आहेत. अर्थात त्यांना मार्क कमीच मिळतात. गोरा वर्ण उच्च संस्कृतीचा द्योतक मानला जातो तर काळा रंग किंवा इतर मिश्र रंग रानटीपणाचे किंवा कमी दर्जाच्या संस्कृतीचे मानले जातात आणि या दोन वर्षांचा संकर न होऊ देण्याबद्दल गोरे लोक डोळ्यात तेल घालून जपत असतात. तेव्हां वर्णांवरूनच जाती पडल्या असे मानले तर फक्त दोनच जाती पडल्या पाहिजेत. महाभारत, शांतिपर्व, अध्याय १८८. (चातुर्वर्ण्यविभागकारण) येथे वर्णा (रंग)- बद्दल जी माहिती आली आहे. ती येथे समग्र नमूद करतो. भृगु म्हणतात:- (ब्राह्मण हे सत्यगुणी असतात व सत्वगुणाचा वर्ण शुभ्र आहे, म्हणून) ब्राह्मणांचा वर्ण शुभ्र होय. (क्षत्रिय रजोगुणी असतात व रजोगुणाचा वर्ण रक्त आहे. म्हणून) क्षत्रियांचा वर्ण रक्त आहे. (वैश्य हे रज आणि तम या गुणांनी व्याप्त असतात. अर्थात रक्त आणि कृष्ण या दोन वर्षांच्या मिश्रणापासून उत्पन्न होणारा अन्त) पीत (तांबड्या व काळ्या रंगाचें मिश्रण पिवळे होत नाहीं.
शास्त्रीय दृष्टीनें ही मिश्रणाची कल्पना खोटी ठरते.+म्हणजे धर्मलंडपणा नव्हे. ब्राह्मण्याला परिपोषक अशा धर्मवृत्तीचा त्याग एवढाच अर्थ येथे गृहित धरलेला आहे.) वर्ण हा वैश्याचा असतो; आणि (ज्याचा वर्ग कृष्ण आहे अशा तमोगुणाने व्याप्त असल्यामुळे शूद्र कृष्णवर्ण असतात भरद्वाज म्हणतात:- ह्या ब्राह्मणादि चार वर्णात जो परस्पर मंद आहे. त्यास कारण जर तादि वर्ण असतील, तर मग सर्वच वर्ण संकीर्ण आहेत असे दिसून येते. कारण प्रत्येक वर्गात निरनिराळ्या रंगाचे लोक आहेतच. सारांश, रंगावरून वर्णभेद मानता येत नाही. इतर कारणामुळे वर्णभेद मानतां येत नाही कारण आम्हां ब्राह्मणादि सर्वही वर्णावर काम, क्रोध, भय, लोभ, शोक, चिंता, क्षुधा आणि श्रम ह्या सर्वांचा सारखाच अंमल आहे. मग वर्णभेद असण्याचं कारण काय? ब्राह्मणादि सर्वहि वर्णाच्या शरीरातून धर्म, मूत्र, कफ, पित्त आणि रक्त ही सारख्याच रीतीने बाहेर पडत असतात. मग वर्णभेद मानण्याचे कारण काय? स्थावर आणि जंगम प्राण्यांच्या अनेक जाति असून त्यांचे रंगहि अनेक प्रकारचे आहेत मग रंगावरून वर्ण ठरवावयाचा झाल्यास तो कसा ठरविता येणार? भरद्वाज म्हणतात:
न विशेषोऽस्ति वर्णानां सर्वं ब्राह्ममिदं जगत् ।
ब्रह्मणा पूवृ सृष्टं हि कर्मभिर्वर्णतां गतम् ॥
असा काही भेद नाहीं हे सर्व जग प्रथम ब्राह्मणच होते. कारण ते ब्रह्मदेवाने निर्माण केलें आहे. पण कर्माच्या अनुरोधाने त्याला वर्णाचे स्वरूप आले. ह्या ब्राह्मणांपैकी जे रजोगुणी होते ते विषयाची प्रीति, तीव्रता कोपिष्टपणा, साहसकर्माची आवड आणि स्वधर्मत्यागा ह्यामुळे क्षत्रिय बनले. रज व तम ह्या गुणांचे मिश्रण झालेले जे ब्राह्मण ते पशुपालन आणि कृषि ह्यांजवर चरितार्थ चालवू लागले व त्यांनी स्वधर्माचरण करण्याचे सोडून दिलें ह्यामुळे ते वैश्य बनले आणि ब्राह्मणांपैकी जे तमोगुणी असल्यामुळे हिंसा व असत्य ह्यांजवर आसक्त झाले आणि लोभामुळे हव्या त्या कर्मावर उपजीविका करूं लागले, ते शूद्र झाले. सारांश, त्या कर्माच्या योगाने मूळच्या जातीपासून भिन्न होऊन हे निरनिराळेच वर्ण बनले. तथापि त्यांना तत्तद्वर्णाचित धर्म आणि पंचमहायज्ञादि कर्मे ह्यांचा केव्हाहि निषेध केलेला नाही ."ऐतिहासिक दृष्टीची सडेतोड भाषा आणि पौराणिकी विवेचनाची ही भाविक भाषा यांत शब्दरचनेचा आणि विचाररचनेचा जरी काही भेद दिसत असला, तरी मूलत हे महाभारतीय विवेचन ऐतिहासिक दृष्टीपासून फारसे भिन्न नाहीं, हे वाचकांना कळेलच.
* * * *
(१६) श्रीकृष्णानें भगवद्रीतेत गुणकर्मविभागाश: चातुर्वर्ण किंवा चतुर्वर्ग निर्माण केल्याचें जें सांगितले आहे. त्यांतील मतितार्थ समाजशास्त्र व इतिहास या दोन दृष्टीनी येथे थोडासा परीक्षण करू समाज अस्तित्वात आला, त्यांतील घटकवयांना परस्पर संबंधाची थोडीबहुत जाणीव होऊ लागली, सामाजिक सौख्याची त्याची कल्पना विकास पावू लागली आणि समाजाच्या चिरस्थाईत्वाची एक प्रकारची विवंचना उत्पन्न झाली की त्याला प्रथम धर्माची भूक लागते आणि नंतर शास्त्राची लागते.
आधी धर्म नंतर शास्त्र
हा एक अबाधित क्रम समाजशास्त्रवेत्यांनी ठरविलेला आहे. धर्माची भूक ईश्वरविषयक ज्ञानाशिवाय भागत नसते. अर्थात या ईश्वर-विषयक ज्ञानाचा शोध लावून त्याचा समाजाला पुरवठा करणारा जो वर्ग समाजांतूनच उत्पन्न होतो. त्याला साहजीकच एक प्रकारचे महत्त्व येते. ब्रह्म कार्य आहे किंवा असावे याचा मानवी विवेकाला पटण्याइतक्या तर्कशुद्ध पद्धतीनें शोध करून त्याचें ज्ञान समाजाला करून देणारा जो वर्ग तो ब्राह्मणवर्ग होय आणि तो प्रथमच समाजातून उत्पन्न झाल्यामुळे त्याला एकप्रकारचें श्रेष्ठत्व द्यायला समाजाचे इतर घटकावयव कधीहि कां कूं करीत नाहीत, तेव्हा ब्रह्मशोधन आणि ब्रह्मज्ञान-अध्यापन हे ब्राह्मणाचे गुणकर्म ठरले. परंतु नुसत्या ब्रह्मज्ञानाच्या कोरड्या भांडवलावर समाज कांही जिवंत राहू शकत नाही, किंवा नुसत्या ब्रह्मज्ञानमग्नांचाहि समाज अस्तित्वांत येऊ शकत नाही. यानंतरची दुसरी पायरी म्हणजे समाजातील घटकावयांवर योग्य प्रमाणांत दाब ठेवून त्यांचे परचक्रांपासून किंवा अंतस्थ कलहापासून संरक्षण करण्यास खंबीर असा वर्ग समाजांतूनच निर्माण होतो. याला क्षत्रियवर्ग असे म्हणतात. क्षत्रियांचें गुणकर्म, पराक्रम आणि राजसत्ता यांत साठविलेले असतें. म्हणूनच त्यांना राजन्य अशी दुसरी संज्ञा आहे. कुंकुमतिलकाशिवाय (हिन्दुजनात तरी) जसें कोणत्याहि स्त्रीला सौभ्याग्यवती म्हणणे रास्त होत नाही, त्याचप्रमाणे राजसत्तेचा राजदंड हात असल्याशिवाय क्षत्रियांच्या क्षात्रवृत्तीला कोणी मान्यता देणार नाही.
ज्याच्या हाती राजदंड तोच क्षत्रिय.
समाजाच्या संरक्षणाकरितां लढणें, त्याच्या हिताकरितां दंडनीतीनें त्याचें शासन करणे आणि कोदण्डाच्या टणत्कारानें प्रतिस्पर्ध्याना दाबात ठेवून सर्वत्र शांतता राखणे या सर्वांचा क्षत्रियांच्या गुणकर्मात मुख्यत्वें समावेश होतो. येथपर्यंत सर्व ठीक जुळले. ब्रह्मज्ञानाचा शोध लावून ब्राह्मण आले. आम्ही सर्वांचें रक्षण करू म्हणून मिशांवर पीळ देत दंड थोपटीत क्षत्रिय आले. पण समाज कांही या दोन वर्गांच्या गुणकर्मानीच जिवंत राहणें शक्य नाहीं. हे सगळे विठोबा जमले पण समाजाच्या पोटोबाची व्यवस्था काय? अर्थात् समाजाच्या आर्थिक गरजा भागविणाऱ्या, अर्थ निर्माण करणाऱ्या, सांपत्तिक स्थिति बलवत्तर करणाऱ्या अशा अणखी एका तिसऱ्या वर्गाची समाजाला गरज पडते. ही गरज शेतकी, उदीम, व्यापार, कलाकौशल्य यांत प्रविण असणारा वैश्यवर्ग समाजांतूनच निर्माण होऊन पुरी पाडतो. तेव्हां शेतकी व्यापार कलाकौशल्य यांचा वैश्यांच्या गुणकर्मात अंतर्भाव होतो. यानंतर या तीनहि वर्गाच्या नियुक्त कर्तव्यकर्मात अडथळा येऊ नये, त्यांचे विवक्षित गुणधर्म समाजाच्या सर्वांगीण हितासाठी योग्य रीतीनें बजावले जावे, म्हणून त्यांची हरएक प्रकारची सेवा करण्यांत वाकबगार असा एक शूद्र वर्ग समाजातूनच निर्माण होतो व त्याच्या गुणकर्माची परीक्षा त्याच्या सेवावृत्तीच्या वाकबगारीवरून ठरते. वास्तवीक म्हटलें तर शूद्र वर्ग असा अगदींच स्वतंत्र वर्ग असत नाहीं. शूद्र हा व्यक्तीचा किंवा समूहाचा सेवक असतो. अर्थात् सेव्य समूहाच्या गुणकर्मानुसार निरनिराळ्या सेवा करीत ह वरील तीनहि वर्गांत पांगलेला असतो. चातुर्वर्ण्यं मया सृष्ट गुणकर्मविभाग से ज भगवंतानी म्हटलें आहे, त्याचा वास्तवीक आणि खरा आशय वरील मजकुरातील विवरण संतोतंत जुळणारच असला पाहिजे. कारण हिंदुस्थानाशिवाय जातीचे बंड नसलेल्या इतर सर्व देशातील समाज या गुणकर्मविभागशः वर्गवारीनेच आपापले धार्मिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिक संसार बिनतक्रार चालवित आहेत. कितीहि आणि कसाही विचार केला तरी
गुणकर्मविभागशः वर्गवारी
हेच तत्व सनातन दिसते आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंतांनी त्याचा आपल्या भगवद्गीता ग्रंथात समावेश केला. हे जर खरं आहे, समाजहितासाठी कोणीतरी ब्राह्मण आणि कोणीतरी क्षत्रिय कोणीतरी वैश्य व कोणीतरी शूद्र झालेच पाहिजे आणि शूद्रप्रवृत्तीच्या माणसाला जर ब्राह्मण्य साधणे शक्य नाही किंवा वैश्यप्रवृत्तीच्या माणसाला तागडीच्या ऐवजी तरवार पेलणे निसर्गत:च कठीण जाते, तर मग हिन्दुस्थानातच हे जन्मसिद्ध जातीभेदाचे भूत उत्पन्न कसे व का झाले? ब्राह्मणानें शूद्र वृत्तीची हाव बाळगून तीतच रममाण व्हावें आणि शूद्रत्वाची पाटी कपाळावर मारलेल्या प्राण्यांनी ब्राह्मणांना ब्रह्मविद्येत पराभूत करून क्षत्रियांनासुद्धा
चल ये पुढे होऊं दे दोन हात
म्हणून आवाहन करावें, हा काय चमत्कार आहे? हिंदुस्थानाशिवाय इतरत्र अशा प्रकारची स्पर्धा कोठेही दिसत नाही. गुणकर्मविभागशः वर्गवारी अशाच उदात्त व धूर्त दृष्टीने प्राचीन आर्यानी शोधून काढली की तिच्यामुळे समाजात समतोलपणा राहून असंतोष कोठेच माजू नये. मग हा सनातन सिद्धांत हिंदुस्थानांतच का फोल होत आहे ? जन्मसिद्ध जातीभेद आणि जनतेची बौद्धिक गुलामगिरी यांवर ज्यांच्या नाटकी वर्चस्वाचे मनोरे अझूनपर्यंत जीव धरून उभे आहेत. असे जातिभेदाचे कांही भिक्षुकी मंडणमिश्र मोठ्या आवेशाने प्रतिपादन करतात की "अहो, जातिभेद नाहीं कोठें ? सगळीकडे आहे. इंग्लंडांत आहे. फ्रान्सात आहे. जर्मनीत आहे. अमेरिकेत आहे.
मसणांत सुद्धां जातीभेद आहे.
(मुंबईच्या सोनापुरात नसला तरी शहाण्या पुण्याच्या ओंकारेश्वरात जातिभेद खरोखरच आहे. हे पुण्याच्या राष्ट्रीय बाण्यास मोठे भूषण आहे, हे कोणीहि झाला तरी प्रांजळपणे कबूलच करील.)
इंग्लंडातले बडे लॉर्ड लोक कधी मजूर वर्गांशी अन्नव्यवहार तरी करतात काय, मग बेटीव्यवहाराची गोष्टच राहू द्या! त्यांच्यांतसुद्धा श्रीमान, मध्यम आणि सामान्य असे तीन भेद आहेतच की नाही? आमच्याकडे एक जास्त. मग जातीभेद नाहीं असे कसे म्हणता? आमच्याकडे जातिभेदामुळे जर असंतोष आहे असें घटकाभर गृहीत धरले तर विलायतेतहि तोच प्रकार सध्या चालू आहे. [जातिभेदामुळे असंतोष माजला आहे हे या मंडणमिश्रांस मान्यच नाही उलट जातिभेदच नाहीं असें ते प्रतिपादन करीत असतात.] हे मजुरपक्षाच्या धडपडीकडे पहा म्हणजे कळून येईल." इंग्लंडांतील किंवा यच्चावत् पाश्चात्य देशांतील असंतोषाचे कारण आणि आमच्याकडील सामाजिक असंतोषाचे कारण या दोनहि गोष्टी पूर्व-पश्चिमेइतक्याच भिन्न आहेत. तिकडे वर्गभेद आहे परंतु तो लवचिक आहे. तो दर्जावर मानला जातो. त्याच्या मर्यादा पराक्रमी पुरुषाला एकाच जन्मात उल्लंघितां येतात. सामान्य वर्गात चर्मकाराच्या घराण्यांत जन्माला आलेले लॉइड जॉर्ज स्वपराक्रमानें ताडकन उडी मारून श्रीमान वर्गाच्या दर्जावर जाऊ शकतात. इकडे
जाती जन्मावर ठरल्या
असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या गुणकर्मांचा विकास होऊ न देतां जन्मप्राप्त जातीच्या कफनाखालीच असंतोषाच्या क्षयरोगाने झुरून मरून मसणवटीची वाट धरावी लागते. त्यांचा परिस्थितिसिद्ध वर्गभेद लवचीक व उल्लंघनीय, आमचा जन्मसिद्ध जातीभेद कडकडीत व अनुल्लंघनीय. त्यांच्या सामान्याला गुणकर्माच्या पराक्रमाने मध्यम किंवा श्रीमान एकाच जन्मांत होता येते. आमच्या शुद्रांना गुणकर्माच्या जोरावर शाहण्यासुर्त्या ब्राह्मण लोकांच्या आवारांतसुद्धा येण्याची मनाई. एवढा हा ठळक भेद या मंडणमिश्रांच्या ध्यानी येऊ नये काय? गुणकर्मविभागश: ठरलेल्या वर्गवारीचे दुष्ट पर्यवसान जन्मप्राप्त जातींत भिक्षुकशाहींने केलेलें आहे हिंदुस्थानांतील सामाजिक असंतोष आणि पाश्चात्य देशात हल्ली बोकाळलेला असंतोष यांची किंचित बारकाईनें छाननी केली तर पाश्चात्य देशांतील निरनिराळ्या वर्गातील चुरस म्हणजे
समसमान हक्कांचें भांडण
आहे असेच दिसून येईल. स्त्रीपुरुषांच्या बरोबरीच्या हक्कासाठी भांडभांडून अखेर पार्लमेंटांत खुर्च्या पटकवल्या. मनुष्यप्राणी ही सर्व एकाच ईश्वराची लेकरे असल्यामुळे एकानें मरेमरे तो काम को करावे आणि दुसऱ्यानें ऐदी खुशालचंदप्रमाणे त्यांच्या श्रमाच्या मोबदल्यावर गब्बर का व्हावे? हा एक प्रश्न तिकडे (Equality in civil life is something absolutely impossible; for individual distinetions of sex and age will always assert themselves; and even if an equal share in the Government is accorded to all citizens, women & children are immediately passed by and remain excluded. The distinction between poverty and riches, th influence of skill and talent, can be as little ignored, utterly refuting those abstract assertions.
Philosophy of History - Hegel, p.) उपस्थित झाला आहे. याच प्रश्नातून बोल्शेविझम् ऊर्फ समानसत्तावादी रामरगाडया गुंडांचा धुडगुस जन्माला आला आहे. या धुडगुसानें पोट आणि अवयव या तात्विक गोष्टीतले किंवा गुणकर्मविभागशः सूत्रांतलें उत्कृष्ट तत्व पायाखाली लाथाळले जात आहे. अर्थात या
गुंडांच्या गुंडगिरीचा परिणाम
तिकडील समाजरचनेचा अखेर विध्वंस केल्याशिवाय राहणार नाहीं, असें भाकीत करण्यास ज्योतिषशास्त्राचा उपाय करायला नकोत. पाश्चात्यांच्या या असंतोषाच्या मुळांशी राजकीय सत्तेच्या वर्चस्वाची अहमहमिका आहे. आमच्या इकडील असंतोष सामाजिक जुलमाचा प्रतिकार करण्यांसाठी उत्पन्न झाला आहे आणि तो आजच उत्पन्न झाला नसून, जन्मसिद्ध सामाजिक उच्च-निचतेच्या भावनेने गीतेतील गुणकर्मविभागाच्या व्यवस्थेची मुस्कटदाबी करण्याचे गुप्तकारस्थान जेव्हां जन्माला आलें तेव्हांपासूनच आहे. आमची प्राचीन समाजरचना व समाजव्यवस्था आतांप्रमाणे जन्मप्राप्तीच्या काकतालीय न्यायावर अथवा अनुवंशिक संस्काराच्या काल्पनीक म्हणूनच असिद्ध अशा सिद्धांतांवर ठरविलेली नव्हती.
राष्ट्रसेवा हा हिंदूंचा समाजधर्म
होता. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आंगच्या नैसर्गिक गुणकर्माचा पूर्ण विकास करण्याची मुभा होती. या गुणकर्मविकसनाच्या मार्गात कोणत्याहि प्रकारचे दैवी मानवी धार्मिक किंवा सामाजिक निर्बंधांचे अडथळे उत्पन्न झालेले नव्हते. म्हणूनच तत्कालीन हिंदी आर्याना समतोल समाजव्यवस्थेच्या जोरावर सारी दुनिया पादाक्रांत करणे सोपें गेलें. ज्या ज्या क्षेत्रांत ज्याला ज्याला जी जी कर्तबगारी गाजवितां येण्यासारखी असे, तिचा तो सार्वजनिक व राष्ट्रीय हितवर्धनार्थ उपयोग करण्यास पूर्ण स्वतंत्र असे. यामुळे प्रत्येकाच्या विवक्षित गुणकर्माचा उत्तम परिपोष होऊन तेंच उत्तरोत्तर अधिकाधिक जोमदार व कणखर बनविण्याची संधी त्यास प्राप्त होत असे. अशा प्रकारच्या दूरदर्शी आणि मुत्सदेगिरीच्या वर्गवारीमुळे राष्ट्रांत सांपत्तिक विभागणी यथायोग्य प्रमाणांत होऊन दुर्भिक्ष किंवा असंतोष यांचे वारें कोठेहि नसें मानसिक व नैतिक बल धरारत असे.
राष्ट्राची सर्वांगीण कर्तबगारी सदासर्वदा कर्तव्योन्मुख असे आणि सर्वत्र समाधान असल्यामुळे प्रगमनशीलतेची मुस्कटदाबी किंवा नवमतवादाची गळचपी कधींच होत नसे. वैयक्तिक किंवा सामाजिक उच्चनीचतेचा मक्ता जन्मप्राप्तीच्या स्वाधीन नसल्यामुळे प्राचीन हिंदू आर्यांत अक्षरशून्य महामूर्ख ब्राह्मण, शेंदाड क्षत्रिय, कमकुवत वैश्य किंवा दास्यातच कुझणारे शूद्र मुळींच अस्तित्वात नव्हते.
रेव. एफ. डी. मॉरीस आपल्या The religions of the world (p. 43 ) नामक ग्रंथांत म्हणतात, "शूद्र म्हणजे गुलाम असे मुळीच समजू नका, त्यांना गुलाम करता येणें शक्यच नव्हते. (कारण गुलामगिरीची कल्पना प्राचीन हिंदू आर्यात मुळींच नव्हती.) हिंदुस्थानांतील सर्व वर्गाचे लोक स्वतंत्र नागरीक असलेले पाहून ग्रीक लोकांना मोठा अचंबा वाटला." त्याचप्रमाणे हिंदुस्थानचा इतिहास कर्ते मि. एलफिस्टन साहेब म्हणतात " हिंदूंच्या प्राचीन नाट्यग्रंथांत राज्याच्या सभोवती असणाऱ्या कोणत्याही व्यक्तींच्या भूमिका पहा, त्यांत गुलामगिरीचा लवलेषहि तुम्हांला आढळून येणार नाहीं ही एक विशेष लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट आहे. " (पृ. २४३). त्या काळी ब्राह्मणाच्या पोटी जन्मल्यामुळे कोणी ब्राह्मण मानला जात नसे किंवा शूद्राचा पुत्र म्हणून यावज्जन्म शूद्रवृत्तींतच कोणास खितपत पडावें लागत नसे. ब्राह्मण म्हणविणाऱ्याच्या किंवा ब्राह्मणाच्या गुणकर्मात प्रविण असणाराच्या पुत्राला क्षत्रिय वैश्य किंवा शूद्रहि होणें भाग पडत असे आणि शूद्रसुद्धां स्वतःच्या गुणकर्मानी वैश्य क्षत्रिय किया ब्राह्मण बनूं शकत असे. के. कर्नल आल्कोट म्हणतात, "हिंदू लोक आतां जसे जातिभेदाच्या बिनमुक्त तटबंदींत जाम जखडले गेले आहेत, तसे ते पूर्वी मुळींच नव्हते आपापल्या जन्मजात गुणकर्माप्रमाणे समाजव्यवस्थेतील अत्युच्च मानाचा दर्जा पटकविण्यास किंवा अत्यंत निकृष्ट दर्जात जाऊन पडण्यास प्रत्येकजण अगदी स्वतंत्र असे.` आपस्तंब धर्मसूत्रकारांचा अभिप्राय जवळजवळ असाच आहे :
अधर्मचर्यया पूर्वो वर्णो जघन्यं जघन्यं वर्णमापद्यते जातिपरिवृतौ ||१०||
‘अधर्मधरणाने उच्च वर्णाचा मनुष्य अवनत होतो.’ शांकरदिग्जयकार म्हणतात "जन्मना जायते शूद्रः संस्कारात् द्विज उच्यते । वेदपाठी भवेत् विप्रः ब्रह्म जानाति ब्राह्मणः ॥ [ अर्थः- जन्मतः प्रत्येकजण शूद्र असतो आणि पुढें संस्कारामुळेच द्विजत्व प्राप्त होते वेदाभ्यासप्रविणाला विप्र ही संज्ञा प्राप्त होते. तर ब्रह्मज्ञानवेत्ता ब्राह्मण होतो.] या तत्त्वांना सिद्ध करणाऱ्या अनेक माणसांच्या गोष्टी प्राचीन ग्रंथांत ठिकठिकाणी दिलेल्या आढळतात. ऐतरेय ब्राह्मण ग्रंथांत (२-३-१९) कवष ऐलुषाची हकीकत आलेली आहे. कवष ऐलुष हा हीन जातीच्या स्त्रीपासून जन्मलेला शूद्र होता. परंतु याच्या अगाध विद्वत्तेमुळे याला ऋषिवर्गात उच्च स्थान देण्यात आले. विशेष गोष्ट ही की हा हीनजात शूद्र अखेर ऋग्वेदातील काही ऋचांचा कर्ता बनला. (ऋ. मं. १०-३० ते ३४) छांदोग्योपनिषदातील सत्यकाम जाबालीची कथा तर प्रसिद्धच आहे. याच्या बापाचा पत्ता तर नव्हताच नव्हता. परंतु मातोश्री सैरंध्री कर्म करीत असल्यामुळे अनेक यजमानांपैकी कोणाच्या अंशाने जाबालीची उत्पत्ति झाली हे सुद्धां तिला धड सांगता येईना.
परंतु सत्यप्रीति सत्यवचनप्रियता) या एका गुणामुळेच (आधुनीक भिक्षुकीभाषेत बोलायचे तर) त्या
अकरमाशाचा ब्राह्मणांत समावेश
बिनदिक्कत करण्यात आला आणि अखेर हाच जाबाली एका यजुर्वेद शाखेचा संस्थापक बनला. सुप्रसिद्ध पाणिनी आपल्या अष्टाध्यायीच्या ६ व्या अध्यायात चक्रवर्मा नावाच्या एका व्याकरणकाराचा उल्लेख करतो वर्मा या उपपदावरून चक्रवर्मा क्षत्रिय होता, हें अधिक स्पष्ट करून सांगावयालाच पाहिजे असे नाही. केवळ गुणकर्मावरूनच ब्राह्मण क्षत्रियादि वर्गांच्या आदलाबदली होत असल्याचा पुरावा देणारी अशी शेकडो उदाहरणे देतां येतील. अगदी अलीकडच्या काळात, ग्रीक लोकांच्या स्वारीच्या सुमारास जरी पाहिलें तरी हिंदु आर्यातला जातिभेद पाषाणी तटबंदीचा बनलेला नव्हता. ग्रीक ग्रंथाकार चारच ("अरायन हा सात जाती असल्यांचे म्हणतो त्या येणेप्रमाणे : (१) Sophists ब्राह्मण, (२) Agriculturists शेतकरी, (३) Herdsmen गुराखी किंवा मेंढपाळ, (४) Handicrafts and artizens कलाकौशल्यवाले (जिनंगर), (५) Warrious लढवय्ये, (६) Inspectors चौकशीदार, आणि (७) Councillors मंत्रि. (Strabo Lib XV) या उताऱ्यावरून गुणकर्मावरून वर्गवारी होण्याची पद्धत त्याकाळी प्रत्यक्ष अंमलांत होती हे निर्विवाद सिद्ध होत आहे.) वर्गाचा उल्लेख करतात. मेगॅस्थेनीस म्हणतो, "A Hindu of any caste may become a Sophist i.e. Brahmana. (कोणत्याही जातीच्या हिंदूला ब्राह्मण होता येत असे.) कर्नल टॉड्चीही जबानी अशीच आहे. तो म्हणतो की "In the early ages of these Solar and Lunar dynasties, the priestly office was not herediatary in families; it was a profession, and the geneologies exhibit frequent instances of branches of these races terminating their martial career in the commencement of a religious sect or` gotra and of their descendants reassuming their warlike occupations." [अर्थ :- फार प्राचीन काळी, या सूर्य चंद्रवंशातल्या पुरोहिताच्या जागा वंशपरंपरेनें विवक्षित कुटुंबांकडेच सोपविलेल्या नसत पुरोहितपणा हा त्या काळी एक धंदा मानला जात असे. (अर्थात् ज्याला तो साधत असे तो करीत असे. बापाने भिक्षुकी केली म्हणून लेकानेही झोळीचा वारसा सिद्ध करण्याची प्रवृत्ति त्या काळी मुळीच नव्हती.) शिवाय दोनहि वंशातल्या अनेक घराण्यांत अशी उदाहरणे आढळून येतात की कित्येकांनी क्षात्रवृत्तीला रामराम ठोकून धार्मिक वृत्तीचा अंगिकार केला व आपले गोत्रहि निराळेंच बनविलें. पुढें याच धर्मप्रवर्तकांच्या वंशांत असेहि कांही वंशज उत्पन्न झाले की त्यांनी धार्मिक वृत्तीला झुगारून देऊन पुनश्च आपल्या जुन्या क्षात्रवृत्तीचा स्वीकार केला.] या सर्व विवेचनावरून इतकें सिद्ध होते की पूर्वी जात ही जन्मसिद्ध किंवा वंशपरंपरेने ठरली जात नसे, प्रत्येक व्यक्ती आपापल्या जन्मानुजन्मपरिणत गुणकमांच्या बलावर उच्च किंवा नीच सामाजिक दर्जा पटकावण्यास पूर्ण स्वतंत्र व मुखत्यार असे. यामुळे
पोट आणि अवयव यांचे भांडण
न लागतां सामाजिक उन्नतीच्या जोरावर इतर सर्व उन्नतींचे गड कोट किल्ले भराभर जिंकण्यास फारसे अवघड जात नसे. अर्थात या उदात्त, व्यापक आणि निसर्गाच्या नियमांना अनुसरून असणाऱ्या वर्गवारींचे पर्यवसान जन्मसिद्ध जातिभेदांत करण्याचा जेव्हां भिक्षुकशाहीनें नीच स्वार्थी उपक्रम केला, तेव्हांच हिंदूंच्या सामाजिक उन्नतीच्या महासागराला ओहटी लागली... ही ओहटी अजूनपर्यंत वाढत्याच प्रमाणावर आहे आणि गेल्या दीड हजार वर्षांत हिनें हिंदूचा स्वाभिमान स्वराष्ट्राभिमान आणि स्वातंत्र्य ही पार धुवून टाकून त्यांना सर्वच बाबतीत
खंक ऊर्फ शंख
बनविलें आहें. आतां या शंखांच्या निव्वळ प्राणत्राणपरायण अशा चळवळींना कोणी शंखध्वनीची उपमा दिल्यास ती अक्षरशः सार्थ नाही, असे कोण म्हणेल? हे कांहीहि असो. गुणकर्मावरून वर्गवारी ठरविण्याच्या प्राचीन तत्वाला मान देणारे लोक व्यवहारांत मात्र गुणभ्रष्टतेचे चोचले माजवून जन्मप्राप्त जातिवर्चस्वाच्या टिमक्या पिटण्याच्या मोहाला बळी पडल्याशिवाय रहात नाहींत, असा अनुभव अझूनही येतो. हल्ली एकराष्ट्रीयत्वाचें वारें हिन्दुस्थानांत वहात आहे. या वाऱ्याचा फायदा घेऊन आपल्या आत्मस्तोमाची शिडें फुगविणारे `राष्ट्रीय` महात्मे, गुणकर्मविभागशः वर्गवारी आणि जन्मसिद्ध जातिमहात्म्याची वारसदारी यांचे भिक्षुकी प्रवचन करतांना एकाच तोंडातून सर्व गरम हवेचे फवारे कसे उडवितात हे पहाणें अलीकडे बरंच करमणुकीचे साधन होऊन बसले आहे
विद्वनमान्य अॅनी बेझंटबाई आपल्या सामाजिक सुधारणांची आवश्यकता या मथळ्याच्या एका व्याख्यानांत गुणकर्मविभागशः वर्गवारी संबंधानें म्हणतात :- जन्म आणि गुणकर्म ही जोडी एकसमयावच्छेदें जर एकत्र नसेल, तर जातीच्या महतीच्या वल्गना फोल होता. महाभारतातील वनपर्वाच्या १८० व्या अध्यायांतील नहुष युधिष्ठिर संवाद पहा, ब्राह्मण कोण? या नहुषाच्या प्रश्नाला युधिष्ठिरानें उत्तर दिलें कीं :
सत्यं ज्ञानं क्षमाशीलमानृशंस्यं तपो घृणा
दृश्यते यत्र नागेंद्र स ब्राह्मण इति स्मृतः ॥
[ अर्थ हे सर्पश्रेष्ठा ज्याच्या आंगी सत्य, दान, क्षमा, सुस्वभाव, धातुकपणाचा अभाव, तप आणि दया ही दिसून येतात त्यासच ब्राह्मण असे म्हणावयाचें] त्यावर नहुषानें सवाल केला की
चातुर्वर्ण्य प्रमाणं च सत्यं चेतृब्रह्म चैवहि।
शूद्रेष्वपि च सत्यंस्याद्दानमक्रोध एव च ।
[ अर्थ:-चातुर्वर्ण्याची व्यवस्था प्रमाण मानली पाहिजे आणि सत्य हेच जर ब्रह्म अथवा ब्राह्मण्य असेल, तर शूद्राच्याहि ठिकाणी सत्य, दान, शान्ति इ. दिसतात. त्याची वाट काय ?] त्यावर धर्मानं स्पष्टच खुलासा केला की:
शूद्रे तु यद्भवेलक्ष्मद्विजे तच न विद्यते |
न वै शूद्रो भवेच्छूद्रो ब्राह्मणो न च ब्राह्मणः ॥
[अर्थ:- जर शूद्रांत है लक्षण असेल आणि ब्राह्मणांत हे लक्षण नसेल, तर तो शूद्रहि शूद नाही व ब्राह्मणहि ब्राह्मण नाही. ज्याठिकाणी हे वर्तन दिसेल तो ब्राह्मण समजावा आणि ज्याठिकाणी हे वर्तन नसेल तो शूद्र समजावा. ]
(महाभारताच्या मराठी भाषांतरकाराची मा स्पष्टोन्तीने अगदी तिरपीट उडून गेली आहे. धर्माचा हा सडेतोड सरळ जबाब ऐकूण खुद्द नहुषाची किंवा तत्कालीन ब्राह्मणांची जरी घामरगुडी उडाल्याचा दाखला नाही, तरी आमच्या कै विद्यावाचरूपति राशिवडेकरांची मात्र मोठी धांदल उडाली. महाराष्ट्रातले मूर्ख लोक या श्लोकाचा शब्दश: अर्थ घेऊन आधुनीक नामधारी ब्राह्मणांच्या ब्राह्मण्य-लेबलाला टरकाऊन त्या ठिकाणी शूद्रत्वाची पाटी ठोकतील की काय, या भीतीनें त्यानी या श्लोकावर तब्बल एक पानभर मल्लीनाथी केली आहे. [चिपळूणकर मया पृ. ३६६ ] कारण काय ? तर म्हणे ब्राह्मणांचेसाबाधाचे हे विवेचन फार दुर्बीध आहे ते फारच सुबोध करताना विद्यावाचस्तति भाषांतरकार खुलासा करतात:- ज्याठिकाणी ही सत्यादिक लक्षणे दिसून येतील तोच ब्राह्मण असून ज्याठिकाणी ती नसतील तो शूद्र होय, असे जे धर्मराजाने सांगितले आहे. त्यावरून ज्याच्याठिकाणी सत्यादि आचार नसतील तो शूद आणि असतील तो ब्राह्मण, असे ठरत नसून, सत्यादिक आचारानी संपन्न असणे हे ब्राह्मणाच्या उत्कृष्ट ब्राह्मणत्वाचें द्योतक होय व ज्याच्या ठिकाणी हे आचार नसतील तो ब्राह्मण शूद्रतुल्य होय असे ठरते तसेंच ब्राह्मणत्व हे मूळचेच सिद्ध आहे असेंहि सिद्ध होतें. म्हणजे, के विद्यावाचस्पतीनी उत्कृष्ट ब्राह्मण व निकृष्ट ब्राह्मण अशा आणखी दोन नवीन ब्राह्मणांच्या जाती पैदा केल्या म्हणायच्या? यांचे नाव भिक्षुकी मल्लीनाथीचा मासला आधींच महाभारत ग्रंथ सौतीच्या घुसडाघुसडीनें मनस्वी संकरपूर्ण झालेला आहे. त्याच्यात असल्या मल्लीनाथथा वरचेवर घुसडूं लागल्या की आणखी शंभर वर्षांनी या महाग्रंथाकडे पहाण्याची सोयच राहणार नाहीं.)
गुणकर्म आणि जाति ही जर एकच नसतील, तर जात म्हणजे शुद्ध ढोंगधत्तुरा होय. अशा जातीच्या अभिमानाला धर्मश्रद्धेच्या सदरांत कोणीहि गणणार नाहीं......आज गेलीं कितीतरी वर्षे ब्राह्मणांनी आपल्या जातीचा सत्यानाश चालविला आहे. हिंदुस्थानांत कोणीकडेहि जा, जेथे तेथें तुम्हाला ब्राह्मणच पुढारी दिसतील, पण विद्येत ज्ञानांत ते मात्र पुढारलेले असतातच असे मात्र मुळीच नाही. आज काल जिकडे पहावे तिकडे
ब्राह्मण वकीलांचा सुळसुळाट !
कायद्यांचा अभ्यास आणि कोर्टातली वकिली हा ब्राह्मणांचा धर्म कधिपासून झाला? कोणाच्या स्मृतीत हा धर्म सांगितला आहे? पण प्रकार काय आहे तो पहा. न्यायाधिशाच्या खुर्च्या आणि वकिलांची दालने ब्राह्मणांनी चिकार भरलेली सार्वजनिक किंवा स्वार्थत्यागाच्या बाबतीत हेच वकील लोकाचे पुढारी असलेले मला ठिकठिकाणी आढळतात. पण वकीली हा काही ब्राह्मणांचा धर्म नव्हे.
कायद्यांचे क्षेत्र क्षत्रियांचेच आहे.
ब्राह्मांना त्यांत ढवळाढवळ करण्याचा अधिकार काय? कायदेपांडीत्यावर उपजीविका करणाऱ्या ब्राह्मणाला मनूनें निषिद्ध मानले आहे. आणि आपल्या अशिलाचा दावा जिंकण्यासाठी ब्राह्मण वकील नेहमीं ज्या मनूच्या वचनांचा आधार घेत असतो. त्याच मनूच्या वचनांनी तो आपल्या ब्राह्मण्याचा आधार समूळ ढांसळवीत असतो; कारण ब्राह्मणाने वकीली करणे हा मनुस्मृतीच्या दृष्टीनें शुद्ध अधर्म आहे. वकीलांप्रमाणे ब्राह्मण डाक्तरांनाही फार ऊत आला आहे. ब्राह्मणाने वैद्यकी करणें हे मनुस्मृतीच्या दृष्टीने अधर्म कर्म होय. माणसांचे रोग बरे करणे हा कांही ब्राह्मणांचा धर्म नाही. बरे, ब्राह्मणाने नेहमी निष्कांचन राहिलें पाहिजे. पण आज ब्राह्मणांत किती तरी ब्राह्मण
सोनें कुटणारे सावकार
होऊन बसले आहेत. कलकत्त्याच्या एका ब्राह्मण वकीलाची मासिक प्राप्ती दहा हजारावर आहे. ब्राह्मण या दृष्टीनें (ब्राह्मण्याची चाड असेल तर) त्याला यांतल्या एक रुपडीलाही हात लावण्याचा अधिकार नाहीं तो अधर्म आहे. त्याने नेहमी निष्कांचनच राहिले पाहिजे. आंगावर दोन वस्त्रे एक धोतर आणि एक उपरणें- याशिवाय कांहींहि घेता कामा नये. वैदिक ज्ञानांत त्यानें पारंगत असले पाहिजे आणि त्याने नेहमी ज्ञानप्रसार करीत राहिले पाहिजे. "[The birth of New India, pp 224-226] "षटकर्मापैकी अध्ययन आणि अध्यापन या दोनच गोष्टी जर ब्राह्मणी परंपरेत अखंड राहिल्या असत्या, तरीदेखिल आजला ब्राह्मणवर्ग हिंदुस्थानांतून नष्ट झाला नसता. परंतु ब्राह्मणेतरांना बौद्धिक गुलाम बनविण्याची अवदसा जेव्हा ब्राह्मणांना आवडली. तेव्हां अध्यापनाबरोबरच त्यांच्या अध्ययन कर्माचाहि समूळ लोप झाला,
यथेमां वाचं कल्याणी मावदानि जनेभ्यः ।
ब्रह्मराजन्याभ्यां शूद्राय चार्यायच स्वाय चारणाय ॥
(यावर श्री. श्रीपाद दामोदर सातवळेकर लोकमित्र जाने १९२० च्या अंकात येणेंप्रमाणे टीका करतात :-" अर्थात् देश जात कुळ गोत्र रंग रूप भाषा इत्यादि कारणामुळे कोणाहि माणसाला विद्येपासून दूर ठेवण्याचा अधिकार कोणालाहि नाही जे कोणी अशा प्रकारे दुसऱ्यांना ज्ञानापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतील ते मानवी उन्नतीच्या मार्गात विघ्नें उत्पन्न करतील. यासाठी सर्वांनी ज्ञानप्रचाराला अवश्य मदत केली पाहिजे. विद्येचा प्रचार करणें हेंच मनुष्यत्वाचा विकास करण्याचे एक मुख्य साधन आहे. "
* (२) Knowledge is the excellency of man, whereby he is usually differenced for a brute,-Swinnock)
अर्थः-- परमेश्वर म्हणत आहे की (यथा ) ज्याप्रमाणें मी ( जनेभ्यः ) सर्व मानवांसाठी, (ब्रह्मराजन्याभ्याम्) ब्राह्मण, क्षत्रिय (अर्याय) वैश्य, शूद्राय ) शूद्र, ( स्वाय) भृत्य, स्त्री इत्यादिक व (अरणाय) अतिशूद्रादिक यांच्यासाठी, ( इमाम् ) या ( कल्याणीम् ) संसार व मुक्ति यांतील सुख प्राप्त करून देणारी (वाचम् ) ऋग्वेदादि चारहि वेदरूप वाणी आहे, तिचा ( आवदानि ) सर्वांस उपदेश केला सर्वांसाठी वेदांचा प्रकाश केला, त्याचप्रमाणे तुम्हीहि करावा. (वेदमंत्रार्थार्थे श्रवण मननहि सर्वांनी करावे व चांगल्याचें ग्रहण व वाईटाचा त्याग करून, दुःखापासून मुक्त होवून आनंदित व्हावें.) ही आमच्या प्राचीन आर्यपूर्वजांची विश्वव्यापक उदार मनोवृत्ति पहा आणि मनु याशंवल्क्य पराशरादिकांच्या स्मृत्यांच्या आधारावर क्षुद्र वृत्तीचा धांगडधिंगा घालणाऱ्या भिक्षुकशाहीच्या नीच मनाचा संकुचितपणा पहा:--
(१) न शूद्राय मतिं दद्यान्नोच्छिष्टं न हविष्कृतम् ।
न चास्योपदिशेद्धर्म न चास्य व्रतमादिशेत् ८०-४
यो हास्य धर्ममाचष्टे यश्चैवादिशति व्रतम् ।
सोऽसंवृतं नाम तमःसह तेनैव मञ्जति ।। ८१-४
अर्थः-- शूद्रास साक्षात् फल देणारी युक्ति सांगू नये, जो दास नाहीं अशा शूद्रास उच्छिष्ट अन्न देऊ नये. होम करून राहिलेला हविःशेष देऊ नये. त्यास कोणताही धर्मोपदेश करू नये कोणतेंहि प्रायश्वतादि व्रत सांगू नये, तर ब्राह्मणास मध्यस्थ करून त्याच्याद्वारा त्यास धर्मादि सांगावें. कारण जो या शूद्रास धर्म सांगतो किंवा व्रतोपदेश करतो तो शूद्राबरोबरच असंवृत नामक गहन नरकांत पडतो.
(२) ( वेदाङ्गानि संपठेत्) न शूद्रजन संन्निधौ ।। ९८ ९९-४
अर्थ - शुद्र्लोकांजवळ वेद म्हणू नयेत.
(३) नास्ति स्त्रीणां क्रिया मन्त्रेरितिधर्मे व्यवस्थितिः ।
रक्षिता यत्नतोऽपीहि भतृष्वेता विकुर्वते ।। १५-२
अर्थः-- स्त्रियांच्या जातकर्मादि क्रिया मंत्रांच्या योगानें करू नयेत, अशी शास्त्राची मर्यादा आहे. श्रुति व स्मृति ही धर्माची प्रमाणे असून त्यांचा स्त्रियांस अधिकार नसल्यामुळे त्या धर्मज्ञ तरी ते घालविण्यास त्या असमर्थ व असत्याप्रमाणें अशुभ असतात अशी शास्त्रीय स्थिति आहे.
(४) तान्सर्वान्घातयेद्राजा शुद्रांन्य द्विज लिंगिनः ॥ २२४-९
अर्थः-- यज्ञोपवितादि द्विजचिन्हें धारण करणाऱ्या शूद्रांस. राजानें देहान्त शिक्षा द्यावी.
(५) वेदाक्षरोच्चारणात्तुक्षत्रियैर्धर्मपालकैः
जिव्हाच्छेदस्य कर्तव्यः शूद्रस्येतिविनिश्वयः ॥
अर्थः-- धर्मपालन करणारे जे राजे असतील त्यांनी शूद्र वेदाक्षरांचा उच्चार करील तर त्या जिव्हेचा छेद निश्चयें करून करावा. वगैरे.
कोठें तोंडांत शिशाचा रस ओतण्याचे, कोठे आंगांवर जळते तेल ओतण्याचे, डोळे फोडण्याचे, लिंग छेदन करण्याचे वगैरे अनंत अमानुष शिक्षेचे प्रकार भिक्षुकी (अ) धर्मग्रंथांत ठिकठिकाण आढळतात इतकेंच नव्हे तर भिक्षुकशाहीनें त्यांची अक्षरशः अंमलबजावणी केल्याचे दाखले इतिहासांतून आम्ही वाटेल तितके काढून दाखवू. वरच्यासारखे असंख्य उतारे स्मृत्या व पुराणांसारख्या उनाड भिक्षुकी ग्रंथातून देता येतील; परंतु स्थलसंकोचास्तव येथे एक म्हटले म्हणजे पुरे आहे की आजला असा एकहि धार्मिक (?) ग्रंथ उरला नाही की ज्यात ब्राह्मणांनी आपल्या स्वार्थी मतांची भिक्षुकी खरुज पेरून ठेवलेली नाहीं. एकटा महाभारत ग्रंथच का घ्या ना. तो देखिल अर्वाचीन मिक्षुकी नायट्याने इतका चिडचिडलेला आहे की मोठमोठ्या विद्वान् संशोधकांची उडदामाजी काळे गोरे काय निवडावें निवडणारें | अशी अनुकंपनीय स्थिति जाहली आहे. यावरून एवढाच निष्कर्ष निघतो की आपले स्वतःचे वर्चस्व अबाधित राखण्यासाठी व इतरांना गुराढोरांइतकेंच मतिमंद गुलाम बनविण्यासाठी ब्राह्मणांनी
सनातन वैदिक धर्माचा खून
करण्यासहि मागेपुढे पाहिले नाही; आणि हा धर्माचा खून करणारे, जनतेला निर्विद्य करून गुलाम बनविणारे, अघोरी मतमतांतरें प्रचलित करून अंधश्रद्धेच्या जोरावर मूढ झालेल्या लोकांकडून आपले हातपाय रगडून घेणारे, नाना प्रकारची किळस आणणारी अनितिमान् दुष्कृत्ये करण्यात कोणाचीही प्रत्यक्ष सद्सद्विवेक बुद्धीचीहि दिक्कत न बाळगणारे राष्ट्रघातकी लोक ब्राह्मण्याचा तोरा मिरवायला अजूनहि शरमत नाहींत, तेव्हा त्यांच्या अंतःकरणाची व मेंदूची रचना किती विचित्र असेल याचा वाचकांनीच तर्क करावा हिंदु धर्माच्या विशुद्ध स्वरूपाचें अत्यंत गलिच्छ कुरूप भिक्षुकशाहीने कसे बनविलें, त्याची भगवद्भक्त श्रीनामदेव यांच्या उद्गारावरून चांगली कल्पना होते. नामदेव म्हणतात :--
भजन चाललें उफराटें। कोण जाणें खरें खोटें | सजीवासी हाणी लाथा। निर्जिव पायीं ठेवी माथा ॥
सजीव तुळशी तोड़ा। पूजा निर्जिव दगडा || बेला करी तोडा तोडी शिवा लाखोली रोकडी ॥
तोंड धरुनी मेंढा मारा। म्हणती सोमयाग करा ॥ जित्या पितरां नेदी अन्न । मेल्या करी पिंडदान ||
सेंदूर माखुनिया धोंडा पुजा करिती पोरें रांडा ||
अग्निहोत्रांचा सुकाळ | कुश पिंपळाचाकाळ ||
तिन्ही देव पिंपळात | अग्निहोत्री केला घात |
मृत्तिकेचा पूजा नाग। जित्या नागा देती डाग ||
नामा म्हणे अवघें खोटें एक हरिनाम गोमटें |
या सर्व भिकार गोष्टींचा परिणाम व्हायचा तोच झाला. सुप्रसिद्ध स्पष्टवक्ते व निस्पृह लेखक कै. रावबहादुर लोकहितवादी आपल्या स्वाध्याय नामक ग्रंथांत (पृ. ११८) म्हणतात.
“...विद्याहीन व उपयोगहीन, केवळ माळा तिलक व मुद्रा हीं बाह्य चिन्हें धारण करून, भांग गांजा अफू इ. खाऊन आळसांत निमग्न राहणारे भंगड ते साधू झाले; केवळ पाठ म्हणणारे ते ब्राह्मण झाले, आणि आळशांस पोसणे हाच धर्म असे लोक मानू लागले. यामुळे उद्योग नाहीसा होऊन भिकारी व अनेक निमित्तांनी फिरणारे अशा संत साधू व ब्राह्मण ह्यांच्या टोळ्यांच्या टोळया सर्वत्र प्रतिष्ठितपणे भिक्षुक वृत्तीनें आणि देशास भारभूत अशा फिरू लागल्या व फिरत आहेत. हे या देशाचे दुर्भाग्य होय. या देशास पुराणासारख्या ग्रंथांनी सत्यतेपासून सर्वथैव पराङमुखता आणिली. मुहूर्त मंत्र जादू किमया व तंत्रे हा व्यर्थ घोटाळा ठिकठिकाणी नमूद करून त्याप्रमाणे अनुभव व ठोके आल्याची मन कल्पित वर्णन, उत्साह व पराक्रम यांजवर आवरण घालण्यास उत्पन्न झाली. अवश्य गोष्टीकडे दुर्लक्ष व निरर्थक नृत्यांची विलक्षण चिकित्सा हि अत्यंत हास्यास्पद होत. तसाच, मेहनतीने पुरुषार्थ करावयाचा सोडून मुहूर्त पाहून व मंत्र म्हणून जयप्राप्ती व लाभ इत्यादिकांचे चिंतन करण्याची वेडे पिकली व दर्भ समिधा व पिंड ही उजवीकडे ठेवावी की डावीकडे ठेवावी? पहिल्याने पाणी शिंपडावे की दर्भ अंथरावे? इत्यादि गोष्टीत चित्त घालून तद्विषयक भवति न भवति करीत बसण्याची चाल पडली. कोणी उदावर बसला अथवा कोणी वृद्धीत हजामत करविली इ. क्षुल्लक गोष्टी उहापोह मोठाल्या सभा भरून आमच्या भिक्षुकांत चालतात. परंतु आपल्या देशाच्या तर्फे विलायतेच्या पार्लमेंट समेत अथवा कौन्सिलांत आणि कचेऱ्यात हुद्याच्या व मोठाल्या जागा मिळाव्या अगर लष्करी पदव्या मिळाव्या म्हणून जमलेल्या मंडळीत अथवा भरलेल्या सभेत जाणे व तद्विषयक वाटाघाट करणे हे त्यांस बरे वाटत नाही, अथवा तसे उद्योग किया प्रयत्न जें कायावाचामनेकरून करीत असतील त्यांस ते बरें म्हणत नाहीत. इतकेच नव्हे तर, तसे होऊन विलायतेस जाणाऱ्यांस वगैरे बहिष्कार घालणे त्यांस प्रायश्वितें देणें ह्याच व्यर्थ गोष्टींना ते उलट भरती देत असतात. लोकहितवादींनी हे उद्गार सन १८८० सालांत काढलेले आहेत. त्याला आज पूर्ण चाळीस वर्षे झाली, तरी हा प्रायश्चित्ताचा झोटींग आमच्या नामधारी ब्राह्मणांना असूनही सोडीत नाहीं, हे लक्षांत ठेवण्यासारखे आहे.
पूर्वी पेशवाई सत्तेला जेव्हां ऊर्ध्व लागला होता. त्याकाळी राघोबादादा पेशव्याच्या वतीने विलायतेला वकीली करण्याकरितां एक ब्राह्मण व एक पारशी वकील गेले होते, दीर्घशाहण्या मनुस्मृतिकाराच्या दृष्टीनें समुद्रयायी नौकेत बसून समुद्रांतून द्वीपांतरास जाणारा महापातकी भ्रष्ट आणि पतित ठरलेला. त्याप्रमाणे हे दोघे वकील विलायतेहून स्वदेशी परत येताच, पारशी वकील आग्यारीतल्या विभूतीच्या चिमटीने तेव्हाच पाक बनला, परंतु ब्राह्मण वकील ( आबा काळे ) नापाकाचा पाक होईना! कारण भिक्षूकी वैदिक धर्मच पडला कडकडीत सोंवळा !
राघोबादादाच्या भोवतीं वेदोनारायण कावळ्यांनी काव काव सुरू केली आणि अखेर सोन्याचे एक भलेमोठे स्त्रीलिंग करून त्यांतून त्यां नापाक पातकी ब्राह्मण वकीलाला बाहेर काढल्यावर तो शुद्ध व पाक झाला. स्त्रीलिंगाचे सोनें धर्ममार्तंडांच्या पदरात पडतांच पतिताला पावत्याची सनद मिळाली. मनुस्मृतीचा जन्म होण्याच्यापूर्वी सीलोन कराची वगैरे ठिकाणांहून सर्व पृथ्वीवर जलपर्यटन करून हिंदुस्थानचा व्यापार वाढविणाऱ्या दर्यावर्दी हिंदूची या धर्ममार्तंडांनी काय अवहेलना केली असती कोण जाणे ? असा Rise of the Maratha Powerp 314 येथे कै. न्या. रानडे सूचक प्रश्न विचारतात. राघोबानें अनेक वेळा समुद्रप्रवास केला, आणि शिवाजी बेदनूरला जातांना समुद्रांतूनच गेला. त्यांनी मनुस्मृतीसारख्या अदूरदर्शी व स्वार्थी मिथुकी ग्रंथाला डोक्यावर घेऊन त्याचे फाजील स्तोम माजविण्याचा धंदा केला असता, तर त्यांच्या हांतून झाला एवढाहि पराक्रम झाला नसता, हिंदु राष्ट्रानें जो इतिहासख्यात पराक्रम गाजविला तो सर्व मनुस्मृतीचा धूमकेतू उगविण्यापूर्वी तो उगवतांक्षणीच हिंदुस्थानाच्या सर्वांगीन वैभवाला आग लागली आणि त्यांचे राष्ट्रीय नपुंसकत्व दिवसेंदिवस वाढत जाऊन त्याला आज दिसत असलेली प्रेतकळा प्राप्त झाली.
आतां या विसाव्या शतकांत मन्वाभिमानी नामधारी ब्राह्मणांचा मेंदु काहींसा ताळ्यावर आला असेल, अशी कोणाची कल्पना असेल तर ती साफ चुकीची आहे. या कूपमंडुकांपासून असूनहि बऱ्याच लोकांना मनस्वी त्रास सोसावा लागत आहे. मुंबईतल्या गुजराथी भाटे लोकांत विलायतेला जाऊन आलेल्या सुशिक्षितांची एक निराळीच जात बनलेली आहे. प्रथम ऋतुस्नात पत्नीला गुरुसेवेला पाठविण्याच्या बल्लगी सांप्रदायांतील लोकविश्रुत छिनाल पद्धतिविरुद्ध धिःकार दर्शविणाऱ्या नवमतवादी सुशिक्षित भाट्यांची आधींच एक नवीन जात बनलेली होती, तीतच जीर्णमतवाद्यांच्या हट्टवादीपणामुळे ही एक आणखी भर पडली आहे. परंतु उठल्यासुटल्या
पुणे तेथे काय उणें
अशी शहाणपणाची मिजास मारणाऱ्या पुण्यांत ही प्रायश्चित्ताची महामारी अझून जिवंत असेल, असे मात्र कोणास वाटत नव्हतें । परंतु जीर्णमताचा भिक्षुकी जीर्ण झेंडा उंच पेलून धरणाऱ्या आचार्याने ती कल्पना चुकीची ठरविली. हे आचार्य व्यापक मनोभावनेचा मोठा गर्वभार वहातात. परंतु मनुस्मृतीच्या भिक्षुकी आखाड्यांत तयार झालेली यांची मनोवृत्ति अखेर आपल्या कूपमंडुकी बाण्यावर घसरल्याशिवाय रहात नाही. शंकराचार्यांचा पुन्हा अवतार होऊन ते लवकरच सर्व नवमतवादी सुधाकरांची हाडें न हाडे चांगली ठेचून काढणार आहेत, असें ते छातीला हात लावून सांगतात. या आचार्य भिक्षुकानें फाल्गुन शु. ११ शके १८४१ च्या आपल्या पाक्षिक चिठोऱ्यांत परदेशगमनावर आपल्या मनुस्मृतिप्रासादिक भिक्षुकी ज्ञानाचे तारे तोडता तोडता अखेर के. बाळ गंगाधर टिळकांच्या परदेशगमनाविरूद्ध प्रायश्वित्ताची चळवळ सुरू. केली. के. टिळकांच्या सार्वजनिक कार्यशैलीत दुटप्पीपणा होता, हा आक्षेप त्यांचे जीवलग स्नेही कै. आगरकरापासून तो विद्यमान् श्रीयुत रँग्लर परांजप्यांपर्यंत त्यांचे सर्व सच्चे विरोधक प्रामाणिकपणे स्पष्टस्पष्ट बोलत आले; इतकेंच नव्हे तर टिळक हे लोकांचे पुढारी नसून शुद्ध लोकछंदानुवर्ति आहेत हे लक्षांत ठेवा, असा के. आगरकरांनी आपल्या सुधारकातून
तुळशीबागेतला शिमगा
झाला त्यावेळी हडसून खडसून दिलेला जाहिर इशारा पुष्कळांच्या स्मरणात असेलच. परंतु गीतारहस्यासारखा अननुभूत तत्वज्ञानाचा दिव्य ग्रंथ निर्माण करणारा अलौकीक पुरुष, न्हाव्याभटाची धणी करणाऱ्या सिंहस्थ पर्वणीच्या सुमारासच भिक्षुकशाहीच्या बाष्कळ प्रायश्चित्तविधिपुढे एखाद्या प्राकृत संसाऱ्याप्रमाणे मान वाकवील ही कल्पना कोणालाहि सुचली नाही. पण अखेर त्या दूरदृष्टी आगरकर द्रष्ट्याचीच वाणी अक्षरशः खरी ठरली. स्वतःचा पुत्र सुद्धा जाहीर रीतीनें नको नको म्हणत असतो, `तुम्ही प्रायश्चित घ्याल तर मी लग्नालाच उभा रहात नाहीं` असा धडधडीत निषेध व्यक्त करीत असतां,
बिचाऱ्या टिळकांनीं प्रायश्चित्त घेतलें
आचार्यकंपूची चळवळ फळली. मनुस्मृतीला दीडबोट मांस चढले. याज्ञवल्क्याला गति मिळाली. पराशराचा उद्धार झाला. बापटी वैदिक धर्माचा बोज राखला गेला, आणि वेदोक्ताच्या टिमकीवर पुराणोक्ताचें कांतडे ताठ चढून, भिक्षुकशाहीच्या कलगी तुऱ्याचा डफ तारस्वरांत खणाणू लागला. या शुभमंगल सावधान विदीच्या वाच्यता करण्याच्याकामी, तृण न धरण्याची कागदी शेखी मिरविणारा कैसरी अगदी मूग गिळून कसा बसला होता व इतर राष्ट्रीय पत्रांच्या दांतखिळ्या कशा जाम जखडल्या होत्या, तें चाणाक्ष वाचकांना सांगायला नकोच. कै. टिळकांच्या या प्रायश्चित्तविधीबद्दल अत्यंत निस्पृहपणाने जर कोणी स्पष्टोक्तीचा अवलंब केला असेल तर साऱ्या महाराष्ट्रांत एकट्या ‘महाराष्ट्र साहित्य’काराने या स्पष्टोक्तीची राष्ट्रीय भिक्षुकशाहीला लागली किंवा नाही हे कांही आम्हांला माहीत नाही परंतु अर्धे हळकुंड खाऊन पिवळा बनलेल्या ठाण्याच्या एका डोळेदार पत्राच्या शिखंडी
संपादकाच्या पगडीनें मात्र पेट घेतला
ही गोष्ट नुकतीच ठाकुरद्वारावर धाडधाड धांवत आलेल्या फायर ब्रिगेडकडून लोकांस समजली. या बाबतीत अधिक वाच्यता न करितां वाचकांनी महाराष्ट्र साहित्य मासिकाचा पहिल्या वांचा १२ वा अंक अवश्य मिळवून वाचावा, अशी शिफारस आहे.
* * * *
(१७) अनुवंशिक संस्कारांची कल्पना अगदीच अयथार्थ किंवा अविश्वसनीय आहे, असा कोणाचाच वाद नाही; परंतु त्याच्या अर्थाचा जो विपर्यास करण्यांत आला आहे. तो मात्र कोणालाहि मान्य होणार नाहीं, शिवाय याबद्दल शास्त्रवेत्त्यांचेहि अझून एकमत झालेले नाही. अनुवंशिकत्वाच्या तत्याचा शोध करण्याची प्रवृत्ति फार प्राचीन काळी ग्रीक लोकांत उत्पन्न झाली होती व त्याबाबतीत त्यांनी काही ठोकळ सिद्धांत प्रस्थापित करण्याचा प्रयत्नहि केला होता. परंतु या बाबतींत विशेष निश्चित यत्नाचा पुरस्कार विसाव्या शतकांतच अस्तित्वांत आलेला आहे. मध्यतंरीच्या शतकश्रेणीत या तत्वाचा शास्त्रीय शोध लावण्याकडे फारसे कोणी लक्ष घातल्याचा दाखला नाही. हल्लींच्या संशोधन प्रवृत्तींचे जनकत्व डार्वीन कडे असून वीस्मन (Weismann) मेन्डेल (Mendel) प्रभृति शास्त्र्यांनीहि या तत्वाची काहीं निश्चित मतें सिद्ध करण्याचा यत्न केला. हा विषय दिसतो तितका सोपा नव्हें. अनुवंशिकत्वाचा पूर्ण छेडा कधिकाळी लागलाच, तर मानवजातीला सृष्टीतील अत्यंत गूढतम अशा एका श्रेष्ठ पारमेश्वरी तत्वाला हस्तगत केल्याचे श्रेय खात्रीने मिळेल ! पण हे श्रेय फुकाचे मिळणारे नव्हें. त्यासाठी संशोधन तपश्चर्येचे पर्वतच्या पर्वत खर्ची घालावे लागतील, अशी खुद संशोधकांचीच जबानी आहे. असल्या जबरदस्त भानगडीच्या तत्वांचे निश्चित संशोधन करतांना आणखी अनेक सवर्गीय तत्वांचा कसोशीने स्वाध्याय करणें प्राप्त आहे व यासाठी न्यायबुद्धीचा समतोलपणा व सत्याच्या चाडीचा निर्दयपणा संशोधकांना अत्यंत तीव्र प्रमाणांत राखावा लागेल. ही गोष्ट बौद्धीक गुलामगिरीच्या भिक्षुकशाही धोरणांशी व्यस्त प्रमाणांत असल्यामुळे अनुकारच भिक्षुकशाहींची पुराणे म्हणजे शुद्ध चहाटाळपणाचे बाजार म्हटल्याशिवाय सुटकाच नाही.
अनुवंशिकत्वाच्या या कल्पनेच्या जोडीनेच बीज आणि क्षेत्र यांच्या शुद्धतेबद्दल मोठे पुराण सांगतात, परंतु ही बीज किंवा क्षेत्राची शुद्धी अजमावण्याची साधनें कोणती, हे मात्र या पुराणिकांना समजत नाहीं व नीटसे पटवूनहि देता येत नाही. नुसतें आमक्या स्मृतीत असे म्हटले आहे आणि तसे सांगितले आहे, हा कांही आधार नव्हें व स्मृतिग्रंथ हे शास्त्रीय ग्रंथहि नव्हत. अर्थात् अमूक बीज शुद्ध आहे आणि अमके क्षेत्र अशुद्ध आहे, हें शास्त्रीय (Scientific ) पद्धतीने जोपर्यंत सप्रमाण पटवितां येणें शक्य नाही, तोपर्यंत या
बीज क्षेत्र शुद्धीच्या वल्गना
`फाल्गुने बालका इव`च होत. उदाहरणार्थ आपण डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हे ब्राह्मण म्हणविणारे हिंदु गृहस्थ आणि मिस एडिथ कोहेन (आता सौ. शीलवतीबाई केतकर) या युरपियन विदुषी, हेंच जोडपे घेऊ, यांत बीज शुद्ध आहे हे कशावरून ठरवायचें आणि क्षेत्र अपवित्र अशुद्धच आहे है करों सिद्ध करायचे? पुण्याच्या खुन्या मुरलीधराच्या अध्यक्षतेखाली मिस कोहेनच्या व्रात्यस्तोमाबद्दल निषेध प्रदर्शित करायला जे रिकामटेकडे `चतुः शाखीय ब्राह्मवृंदमंडळ (?) ता० १२ एप्रिल १९२० रोजी जमलें होतें, त्यांपैकी एकादा तरी प्राणी या परस्पराकर्षी जोडप्याच्या बीजक्षेत्रशुद्धीचे शास्त्रीय तत्वाला पटेल असे काही निश्चित अनुमान पटविल काय? पौराणिकी गप्पांपलीकडे त्यांना एकहि आधार देता येणार नाहीं. असली चर्चाच आधी खोडसाळ आणि तिच्या समर्थनार्थ आणलेले पुरावे शतपट खोडसाळ, बीजक्षेत्रशुद्धीच्या गप्पा जातिभेदाच्या जन्मदिवशीच भिक्षुकी मेंदूतून गळलेल्या आहेत. बौद्धधर्माच्या ऱ्हासानंतर भिक्षुकशाहीने जातिभेदाची जी बंडाळी उठवली त्या बंडाच्या पूर्वी या गावा लागत नाही. हो. आता मनुस्मृतीतल्या लोकांबरहुकूम दिवाणी फौजदारी कायद्यांची नसती ब्याद ऋग्वेद काळाच्या आर्यांच्या बोकांडी मारणारा एखादा पावगी आपल्या अस्तन्या वर सारून, बीजक्षेत्रशुद्धाशुद्धतेचा इतिहास मानगुटीला धरून मागे खेचू लागला व त्याचा उगम त्यांनी प्रत्यक्ष
श्रीविष्णुच्या नाभिकमलांत दाखविला
तरी त्यांचा हात कोण धरणार? ज्यांना वैदिक काळांतसुद्धां (पुण्याचे रावसाहेब पावगी हे एक सुप्रसिद्ध विद्याव्यासंगी संशोधक आहेत. कै. टिळकांनी उत्तर ध्रुवाच्या बर्फात गाडलेली ऋग्वेदकालीन आर्याची थडगीं रावसाहेबांनी नुकतीच तेथून खेचून आणून पंजाबच्या सरहद्दीवर स्थापन केली व संशोधनकौशल्याने टिळकांच्या `योग कर्मसु कौशलम्` वर ताण केली.
इतके जाडे संशोधक जर अर्वाचीन मनुस्मृतीच्या दाखल्यांच्या अधारावर ऋग्वेदकालीन आर्याच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय जीवनाचा इतिहास रंगविण्यास कचरत नाहींत व ऋग्वेदी आर्यांना मनुयाज्ञवल्क्यांतल्या दिवाणी फौजदारी कायद्यांत अडकवायला सोडीत नाहींत, तर उद्या मॉन्टफर्ड रिफॉर्मसच्या खड्यांचे जनकत्व कोणी बाळाजीपंत नातूच्या पदराला बांधल्यात आश्चर्य करण्याचे कारणच उरत नाही. भारतीय साम्राज्याचा इतिहास एवढ्याच व असल्याच संशोधन पुण्याईवर पुरा करायचा असेल, तर कुत्र्यामांजरांच्या शेंपटांवर कादंबऱ्यांचे ढीगच्या ढीग प्रसविणारे श्रीयुत आजकाल रगड आहेत. रावसाहेबानी पैनशनचा काळ आता हरी हरी म्हणण्यांत घालवावा हे बरें.) लोकशाही स्वराज्य अपरंपार दिसतें, त्यांना श्रीविष्णुच्या नाभिकमलांतून ब्रह्मदेवाच्या तोडापर्यंत निर्वेध संशोधनी लीला करता येणार नाही, असे थोडेच आहे? बीजक्षेत्रशुद्धी तत्व है भिक्षुकीमताच्या वर्चस्वाचे ऐतिहासिक स्मारक आहे. यापलीकडें सारासारविचारदृष्ट्या अगर शास्त्रियदृष्ट्या त्याला कवडी हि महत्व नाहीं हे वाचकांनी ध्यानांत ठेवावें.
शुद्ध बीज कसे ओळखावें आणि क्षेत्र अशुद्ध कसे ठरवावे, याचा अझून शोध लागलेला नाही, पुढेमागे कधिं लागल असाहि भरवंसा नाहि. आजपर्यंत हा शुद्धाशुद्धतेचा मामला ´ आह्मी ब्राह्मणानी हे असें ठरविलें आहे ते तुम्हीं सनातन तत्त्व म्हणून मान्य करा` अशा नुसत्या पोकळ स्मृतिवचनांच्या मान्यतेवरच चाललेला आहे, या पेक्षा त्याच्या सत्यत्वाची प्रचीति पटण्याला दुसरा काहीहि आधार नाही. बीजक्षेत्रमहात्म्याच्या या कांदबरीचा धागा ब्रह्मदेवाच्या गळ्यांतल्या जानव्याला अडकविणाऱ्या आधुनिक बृहस्पतींना आमचा एवढाच सवाल आहे की क्षेत्राच्या उच्चनीचतेवर जर तुमचें विशिष्ट प्रजोत्पत्ति तत्व ठरलेलें होतें, तर ज्या वैदिक व भारतीय काळाच्या अनेक ऋषीचे व अनेक इतिहासख्यात नरेश्वरांचे जन्म, तुम्ही मानलेल्या नीच क्षेत्रांत झाले, त्या संकरजात ऋषींना आणि अकरमाशा नरेश्वरांना तुम्ही अझूनहि पूज्य व वंदनीय का मानतां ?
अतिक्षूद्र क्षेत्रांत जन्मलेले सांख्य व पराशर, चांभारणीच्या उदरी जन्मलेला टंकऋषी, विधवेचा पुत्र कौंडिण्य, रंभानामक गांवभवानीचा पुत्र वसिष्ट, कोळणीचा मुलगा व्यास, अविवाहित कुमारिकेला गुपचूप झालेला दीर्घतमा ही मंडळी एकतर काल्पनिक व्यक्त्या होत्या असे सांगून मोकळे व्हा, नाहीतर ब्रह्मदेवाच्या तोडांतून गटकन बाहेर पडलेल्या अतिशुद्ध ब्राह्मणांनी या नीचयोनीजात अकरमाशांवर ग्रामण्य उभे करून त्यांना वाळीत का ठाकलें नाहीं ते तरी सांगा. कुत्र्यामांजरांच्या सशाबेडकांच्या आणि पत्रावळीं द्रोणांच्या पोटी जन्मलेल्या प्राण्यांची यादी आम्ही पुढे आणीत नाहीं. यावर जर तुमचा असा उलट सवाल असेल की क्षेत्र जरी नीच होतें तरी बीज उच्च होतें, तर तेथेंहि तुम्हाला खोटें बोलल्यांशिवाय गत्यंतर नाही. कारण वरच्यापैकी एकाच्याहि खऱ्या
बापाचा पत्ता लागत नाहीं.
शिवाय अमृतासारखा उच्च बीजाचा मद्यासारखा नीच क्षेत्रांत संकर झाल्यास विषोत्पत्तिपेक्षां अधिक चांगले काय निर्माण होणार? एवंच येथे बीजक्षेत्रशुद्धीचा तर बोजवारा उडतोच उडतो , पण अनुवंशिक संस्काराची तरी कोठे दाद लागते? म्हणे ऋषींचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये. का? त्यांत अवैदिक किंवा अशास्त्रीय असे काय आहे? खुद्द ऋषींनी जर आपलें कूळ स्पष्ट सांगितलें आहे, तर त्यांत तुम्हांलाच का वैषम्य वाटावें?
अमूक करूं नये आणि तमूक करूं नये हे सांगण्याचा तो मनुस्मति-मामला मागेच मेला, आतांच्या या विसाव्या शतकांत प्रत्यक्ष देवालासुद्धां शास्त्रीय शोधांच्या चरकांत घालायला जे सोडणार नाहींत. ते काय ऋषींचे कूळ आणि नदीचे मूळ शोधायला कमी करणार? अंधश्रद्धेचे दिवस गेले आणि पौराणिकी गप्पांच्या जोरावर बहुजनसमाजाला बौद्धिक गुलामगिरीत बद्ध करून ठेवण्याचा मनूहि ठार झाला. विवेकबुद्धीचा अंमल चालू झाला आहे.
आतां जुन्यापुराण्या पौराणिक भाकडकथांच्या आधारानें जनता झुलणार नाही किंवा संस्कृत भाषेत रचलेल्या सूत्रांच्या नुसत्या पोपटपंचीला भुलणार नाहीं. प्रचलित काळ ऐतिहासिक सत्याचा आहे. हें सत्य केव्हांहि झाले तरी
बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल
असेच म्हणणार बीजशुद्धी आणि क्षेत्रशुद्धी कशी ठरवायची, कशी पारखायची ते आधी विवेकबुद्धीला पटेल असे सिद्ध करून दाखवा आणि मग
जात्युत्कर्षे युगे ज्ञेयः पश्वमे सप्तमेऽपि वा ।
व्यत्यये कर्मणां साम्यं पूर्ववद्याधरोत्तरम् ॥ याज्ञ० स्मृ० १९६.
ही ब्राह्मणत्व प्राप्तीची गिरणी कशी चालते तिची यंत्ररचना सांगा. नुसत्या जातिविशिष्ट सोयरिकीच्या चढत्या उतरत्या भांजणीने किंवा ब्राह्मण कुटुबांत जन्मणारा प्रत्येक प्राणी त्या विशिष्ट कुटुंबाचेच गुणधर्म घेऊन जन्माला येतो. असल्या त्रयराशिकी विधानाने जर या गोष्टींचा निर्णय उरतो असे मानले तर वाद त्या निर्णयाला सपशेल खोटा ठरवित आहे. सायन्टिफिक (शास्त्रीय शोधांच्या कसोटीला हे स्मृतिकारांचे काल्पनिक निर्बंध मुळींच उतरत नाहींत. इतकेंच नव्हे तर इतिहासाची साक्षसुद्धां शास्त्रीय शोधांच्या जबानीलाच पाठबळ देते. एका विवक्षित काळच्या सामाजिक संघटनेसाठी कांहीं चार विशेष शहाण्या डोक्यांनी एकत्र बसून सामाजिक उच्च नीचतेचे दहापाच ठोकळ नियम ठरविले आणि ते ‘स्मृति’ नामाभिधानाखाली समाजाचे नियमन करण्यासाठी शिफारस केले, एवढच कारणामुळे ते नियम सनातन ठरू शकत नाहीत, त्यांची योग्यता व श्रेष्ठता सर्व काळी सर्वमान्य ठरणार नाही, किंवा प्रत्येक नव्या मन्वंतरातील नवीन शास्त्रीय शोधांपुढे त्यातले तत्व अबाधित राहीलच असा भरवसा मुळींच देता येणार नाही. परंतु जीर्णमतवाद्यांना जुनें तितकें सोनें या कुकल्पनेची कावीळ झाल्यामुळे पूर्वीच्या स्मृतिकारांची सर्वच कृत्य सनातन व अबाधित वाटावी, यांत काही आश्चर्य नाही. हे पुराणमतवादी लोक उन्नत मनोवृत्तीची कितीहि फुशारकी मारोत, त्यांच्या मस्तकांत निराशावादाच्या किड्यांचा बुजबुजाट सनातन चाललेला असतो. गेले ते दिवस चांगले येत आहेत ते वाईट. पूर्वीच काय ते बुद्धिसामर्थ्याचे बृहस्पति निर्माण होत असत. आता सर्वत्र
महामूर्ख शंखोबांचा सुळसुळाट
चालू राहणार याज्ञवल्क्य, जनक, वसिष्ट, वामदेवादी ऋषी उत्पन्न होण्याचा काळ आता गेला. पुन्हा तो कधीही येणार नाहीं. मानवी बुद्धीचा ऱ्हास झपाटयाने सुरू आहे. अहल्या द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या पंचकन्या आतां कशाच्या पुन्हा आमच्या दृष्टीस पडतात! पूर्वी मैथून नियमबद्ध असल्यामुळे स्त्रिीपुरुषांची नीति परीटघडीवजा पांढरीफेक असे आता मैथुनातिक्रम फार झाल्यामुळे सारी दुनिया सडत चालली आहे. अशा भयंकर दुरावस्थेत आम्ही शहाण्यांनी शहाण्या पूर्वजांच्या शुद्ध शहाण्या वंशजांनी विधवापुनर्विवाह किंवा असवर्णविवाहाला कशी बरे संमति द्यावी? धर्म आणि शास्त्र ही पूर्वीच्याच लोकांनी लिहावी आता काय? आतां सगळाच सावळा गोंधळ ! बुद्धि नाहीं, अक्कल नाहीं, तपश्चर्या नाहीं, नीतिमत्ता नाहीं, काहीं नाहीं, आणि हे नकटे सुधारक म्हणतात की आम्ही नवी स्मृति लिहू नये, धर्मशास्त्र निर्माण करूं आणि नामशेष झालेले विधवापुनर्विवाहासारखे प्रघात पुन्हां प्रस्थापित करूं ! मूर्ख कुठचें !! धर्माला ग्लानीवर ग्लानी येत आहेत. समाज अनीतिमान झाला आहे. सोवळ्या ओवळ्याचा ताळसुटून सबगोलंकार सुरू आहे. आम्हां पवित्र ब्राह्मणांची जो तो निंदा करीत आहे. आणि हे सुधारक म्हणे सुधारणा करणार ! अशी माणसाच्या हातून सुधारणा होती तर काय पाहिजे ! शंकराचार्य स्वतः अवतार घेतील, तेव्हा ही बिघडलेली घडी चापूनचोपून नीट इस्तरीत बसेल! या आमच्या पुराणमतवाद्यांच्या कल्पना आणि त्या कल्पनांचा पुरस्कार करणार आमच्या अॅनी बिंझाट बाई, त्यांनी तर एक मैत्रेयावताराची आढीच उबत घातली आहे. आणि ही आढी त्या ज्या दिवशी फोडतील, त्या दिवशी त्यांतून बाहेर पडलेले मैत्रेय ऋषी हिंदुस्थानच्या बादशहाच्या शेजारी दिल्लीच्या तक्तावर बसतील, असे त्यांचे भविष्य आहे.
वर्तमानकाळ वाईट आणि भूतकाळ काय तो सोन्याचा, या कल्पनेचा म्हसोबा ज्यांच्या बोकांडी बसला आहे, त्यांना सारा भविष्यकाळ अंधारग्रस्त दिसावा यांत काही आश्चर्य नाही. मानव जाती दिवसेंदिवस उन्नत होत आहे की अवनत होत आहे. हा वाद पाश्चात्य पंडितांपुढे बरीच वर्षे होता आणि त्यांनी सायन्स व इतिहास यांच्या आधाराने असा निश्चित निर्णय काढला आहे की " I have been led to the firm conviction, which I must now put forward as a Scientific Truth based upon the teachings of anthropology, folk-lore, and the history of civilization that at the present day, in our time so widely decried as nervous", "degenerate", and "over civilized "not only are there no more sexually "perverse" persons than there were in former days......but further, that the greater part of the perversions of the present day are not to be regarded as " degenerations "at all." [Iwan Bloch, M. D. in " The Sexual Life of our Time " P. 456] कलीयुगाचें काळेकुट्ट भेसूर चित्र रेखाटण्यात पुराणकारांच्या काव्यशक्तीला जरी एकप्रकारचे कंडुशमनाचे खाद्य मिळाले व कांही काळ त्यांच्या प्रवचनप्राविण्याची अहोरूप महोध्वनी अशा भिक्षुकशाही कंपूकडून मोठी वाहवा झाली, तरी त्या चित्राच्या नित्य दर्शनानें व मननानें हिन्दुजनांच्या कर्तबगारीचा सारा जोम जाळूनपोळून फस्त केला, ही गोष्ट हिन्दूच्या राष्ट्रीय आपत्तींच्या यादीत अग्रभागी लिहून ठेवण्यासारखी झाली. या भिक्षुकी चित्राने हिन्दुजनांवर निराशावादाचा एवढा जबरदस्त पगडा बसविला आहे की त्यांतून त्यांची धडपणे सुटका होणे फार दुष्कर कार्य होऊन बसले आहे. निराशावादाने सडलेल्या मनोवृत्तीची राष्ट्र दास्यत्वांत कुझून दास्यत्वांतच लयाला जातात. ही गोष्ट आम्हां हिन्दूच्या गळीच उतरत नाहीं. पृथ्वीवरील इतर राष्ट्र आशावादाच्या जोरावर आपापले निश्चित राष्ट्रध्येय साधण्याकडे शक्तियुक्तीची पराकाष्ठा करीत आहेत, भविष्य काळ त्यांना पूर्ण प्रकाशमान् भासत असल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेची तडफ प्रत्यक्ष कालचक्राच्या गतीलासुद्धा मागे पाडीत आहे आणि गतानुभवाची पेस्तर शिल्लक वर्तमान काळाच्या जमेले धरून त्यांत नवीन नवीन अनुभवाची भर घालून हे आशावादी लोक आपल्या उज्वल महत्वाकांक्षा प्रत्यक्ष रंगरूपास आणण्याची पराकाष्ठा करीत आहेत. उलटपक्षी हिन्दुराष्ट्राचा कारभार पहा. जिकडे तिकडे कर्तबगारीचा शुकशुकाट इतर राष्ट्रांपेक्षा ! हिन्दुराष्ट्रांत जर कांहीं विशेष असेल तर गतगोष्टीच्या
स्तुतिपाठाची वाचाळपंचविशी
मात्र लोकोत्तर आहे खरी. येत आहेत ते दिवस वाईट चालू परिस्थिति म्हणजे अनीतीचा शेणसडा व भविष्यकाळ म्हणजे अकल्पनीय अवनतीचा मूर्तिमंत नरक, याच ज्यांच्या ठाम नात्यांनी भूतकालाच्या सर्वांगसुंदरपणाचे खरे खोटे गोडवे गावे तर करावे तरी काय? हा निराशावादाचा म्हसोबा हिंदुच्या बोकांडी बसवून त्यांना जिवंतपणीच प्रेतकळा आणण्याचे राष्ट्रघातकी दुष्कर्म भिक्षुकशाही पुराणांनीच केलेले आहे. याबद्दल एफ. जी. पार्जीटर यांनी साधक बाधक विस्तृत विवेचनानंतर असा स्पष्ट सिद्धांत काढला आहे की "The brahmans. who compiled the Sanskrit account (of the Puranas) could and did fabricate passages portraying the evils of the Kali age" (Dynasties of Kali Age, Intro p. 19) भावार्थ:-- ज्या ब्राह्मणांनी ( पूर्वी प्राकृत भाषेत असलेल्या पुराणांना) संस्कृत पोशाख चढविण्याचा उपक्रम केला, त्यांना त्यांत कलीयुगांतल्या महापातकांची (काल्पनिक) वर्णनें घुसडून देणे फार कठीण नव्हते व ते त्यांनी केलेच. बौद्धधर्माचा पाडाव करण्यासाठी भिक्षुकी धर्माने ज्या उलाढाली केल्या त्यांतील मुख्य महत्वाची चळवळ म्हणजे पुराणांचा कारखाना ही होय आणि मि. पार्जीटर म्हणतात “It was largely through Puranic literature, that brahmanism re-established itself over the people and secured the revival of Hinduisim (?) and the downfall of Buddhism " भावार्थ:-" या पुराणाच्याच द्वारे मुख्यतः भिक्षुकशाहीनें (हिन्दु) जनतेवर आपले वर्चस्व पुन प्रस्थापित केले व बौद्धधर्माचा पाडाव करून हिन्दुधर्माचा
("हिंदुधर्म हा शब्द सामान्यतः भिक्षुकीधर्माच्या ऐवजींच पाश्चात्य संशोधक कावितात. परंतु सध्याचा हिदुधर्म हा शुद्ध वेदप्रणीत हिंदुधर्म नसून भिक्षुकशाहीप्रणीत भ्रष्ट असा हिंदुधर्म आहे, हें पृ. १० टीप येथे स्पष्ट केलेलेच आहे.)
(अर्थात् भिक्षुकीधर्माचा बचाव केला. "या कलीयुगाचा घातकी महिमा कसा काय आहे व पुढचें भविष्य किती भेसूर आहे. हे पाहू इच्छिणारांनी इ. स. च्या ४ थ्या शतकांत जन्माला आलेल्या विष्णुपुराणांतला ६ व्या अंशाचा १ ला अध्याय, व त्याचा मराठी अर्थ देतांना कै. लेलेशास्त्र्यांनी केलेली भिक्षुकी मल्लीनाथी अवश्य वाचावी. पांचपांच सहासहा वर्षांच्या मुलींना पोरें होतील, आठआठ वर्षांची मुले बाप बनतील. बाराव्या वर्षी पांढरे केस होतील व मनुष्याचे आयुष्य वीस वर्षांचे होईल. असल्या खोडसाळ कल्पनांचा पगडा मनावर बसलेल्या लोकांनी
हें असें होणारच हो !
या निश्चित कुकल्पनेच्या भ्रमाने जर हातपाय आढ्याला लावून होईल ते पहात स्वस्थ बसण्याचें ठरविले तर त्यांत त्या लोकांचा काय दोष? कलीयुगांत ओढणाऱ्या निरनिराळया अरिष्ठांची आगाऊच भीती बाळगून त्यांच्या भयानें थरथर कांपणारी जनता निव्वळ निरक्षरांतच आढळते असे नव्हे. मोठमोठे सुशिक्षित म्हणविणारे शहाणे लोकसुद्धा या काल्पनिक भयापुढे मान वाकवून त्या भयाच्या निरसनार्थ भिक्षुकशाहीच्या अडत्येगिरीचा अवलंब करण्यास सोडीत नाही आम्हांला आठवतें कीं सन १८९९ साली कलीयुगाची पांच हजार वर्ष पुरी झाल्यामुळे जगात मोठा प्रलय होणार असल्याचे निक्षुकशाहीचे जाहीरनामे गांवगांव फडकले होते. काशिविश्वेश्वराच्या देवळांत
आकाशांतून सुवर्णपत्रिका पडली
तीतसुद्धा या की ज्योतिष्याचे पूर्ण समर्थन करणाराच मजकूर होता. यावेळी सूरसंस्थानांत मोठीच खळबळ उडाली. सर्व प्रजानन विपद्ग्रस्त स्थितीत दिवाणांच्या बंगल्यावर धांवत गेले व या महासंकटांतून कसे काय पार पडायचे त्याचा बंदोबस्त करावा म्हणून त्याच्या विनवण्या करू लागलें. दिवाणसाहेब दिवाण असले तरी हिन्दूच होते, त्यांना या असल्या भिक्षुकी थोतांडाने ताबडतोब दिवाणे बनविले व भिक्षुकशाहीच्यामार्फत या महाशान्ति वगैरे करण्यासाठी काय खर्चच येईल त्याचे "बजेट" हुजूर सरकारकडून लवकरच ‘सांकशन’ करून घेतो, असें त्यानी प्रजाजनांना सांगून त्यांची बोळवण केली.
नामर्द बुद्धिमतेचा हा मासला म्हणजे हिन्दुलोकांच्या बौद्धिक गुलामगिरीचा कळस होय! अनेक लहानमोठ्या अरिष्ठांच्या पौराणिकी प्रवचनांच्या जोडीनेंच हिन्दुलोकांच्या कर्तबगारीची गळचेपी या ज्योतिषशास्त्राने केलेली आहे. याच ज्योतिषशास्त्रानें शकुनापशकून ग्रहापग्रहांची खेंकटी निर्माण केल्यामुळे माणसांसारखी माणसे पण सापळ्यांतल्या उंदराप्रमाणे आकाशस्थ राहू केतू शनच्या महादशेच्या फेऱ्यापुढे लटलट कापत असतात आणि या प्रसंगीसुद्धा या ग्रहांची शान्ति करण्याच्या कामी भिक्षुकी अडत्यांची पायधरणी करतात. या शकुनापशकुनांनी हिन्दुलोकांना इतके जाम जखडून टाकलें आहे की त्यांच्या गुलामगिरीच्या किळसवाण्या स्थितीपुढे अमेरिकन नीग्रोंची गुलामगिरी पुष्कळच सभ्य व इभ्रतदार ठरेल, ज्योतिषशास्त्राची निष्पत्ति म्हणजे भिक्षुकशाही गुलामगिरीचा दुट्टपी आडपेंच होय. पुराणोक्त वर्चस्वांतून कोणी निसटलाच तर पुढे ज्योतिषशास्त्रप्रणीत महादशेचा फेरा, शनीची दानें मारुतीचा शेंदूर व राहूकेतूच्या जपाच्या मंत्रीमंडळ म्हणून उभीच कोठेंहि जा, तेथे भिक्षुकशाहीचे ह्या नाहींतर त्या कंत्राटाचें लचांड आहेच. भिक्षुकशाहीची आपमतलबी जाळी ही अशी सर्वव्यापी आहेत. परंतु या जाळ्यांच्या सर्वप्रासीपणाची कोणालाहि दाद न लागतां त्यांची यथास्थित मांडणी करण्यांतलें भिक्षुकी कौशल्य जर विल्हेम कायझरला लाभते तर गेल्या महायुद्धांत बिचाऱ्यांच्या मिशांची टोके खाली होतीच ना! कलीयुगांत पातकांचीच परवड लागणार व प्रजा रसातळाला झाणार, तर मग पातकें कळत अगर नकळत आमच्या हातून घडलीच तर त्यांत वावगें तें काय? अशा समजुतीमुळे दुष्कृत्ये करण्याकडे मनुष्यांची प्रवृत्ति बिनधोक होत असते; व कोणी एखादें दुष्कृत्य केलेच तर, ‘हूं चाललंच आहे.’
हा सगळा कलीचा महिमा.
व्यासांनी आधीच हे लिहून ठेवलें आहे. तुका म्हणें उगें रहावें जें जें होईल तें तें पहावें ॥ अशा शेऱ्यापुढे शाश्वत पुण्याईची वखार थापणारे धर्ममार्तण्डसुद्धां अधिक कांहीं करूं शकत नाहीत. फार काय, पण समाजसुधारक हिंदुसुद्धां जात्या हिंदूच असल्यामुळे त्यांच्या हातून समाज किंवा धर्मसुधारणेचे कार्य व्हावे तसे सकस व दणकट होत नाही, याचे कारण हे सुधारक लोकसुद्धा बिलकूल हिंदू असतात, हे होय. सामाजिक किया धार्मिक प्रगतीतून प्राप्त होणाऱ्या सुखाची जाणीव किंवा त्याचा स्वाद घेण्याची रुचीच कलीयुगगहात्म्याच्या या अवडंबराने पार नष्ट झाली आहे. कलीयुगांत सर्व गोष्टी भिकार व घातकी अशाच निर्माण व्हायच्या आहेत ही हिंदुजनांची ठाम कल्पना झाल्यामुळे, त्यांना जगांत वर्तमानकाळी किंवा पुढे येणान्या भविष्यकाळी चांगले किंदा हितकारक असे काहीच दिसत नाही. जिकडे पहावे तिकड आधार अशा या अंधारात निराशावादाच्या आधळ्या कोशिंबिरीचा खेळ खेळणारे हिंदुजन आता राष्ट्रीय स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी सज्ज झाले आहेत! परंतु बौद्धिक गुलामगिरीची निरनिराळी जाळी तोडल्याशिवाय राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या सुखास्वादास हिंदुराष्ट्र कदापिही पात्र होणार नाही. ही मुख्य मुद्याची गोष्ट आमचे विचारक्षम हिंदुबांधव विसरणार नाहीत, अशी आम्हाला फार फार उमेद आहे.
मागे युरोपांत रोसो नामक तत्त्ववेत्त्याने अमच्या इकडील पुराणमतवाद्यांच्या निराशातत्त्वाची तळी उचलून धरून सुधारणातत्त्वाची निंदा करण्याचा एक संप्रदाय स्थापन केला होता. यात अनेक फाजील निष्ठ, सोंवळे शालशिष्ट, बरेचसे मतिभ्रष्ट आणि काही भ्रमिष्ट अनुयायी सामील होऊन, त्यांनी अज्ञानी लोकांना भेवडावून गुपचूप पिळून काढण्याचा एक वेदोक्त व्यापारच सुरु केला होता. स्वतः काहिहि न करता नुसत्या सुधारकांना शिव्या देण्यात किंवा सरांस सुधारणाची निंदा करण्यांत बहुसंख्यांक अज्ञानी लोकांच्या स्तुतिपाठाचा कापूर जर आत्मस्तोमाच्या आरतीत भरपूर पडतो, तर असल्या गव्हाणीतल्या कुत्र्यांची संख्या केव्हाही व कोठेहि सपाटून असायचीच. सरतेशेवटी सुधारणा म्हणजे जगाचा सत्यानाश या तत्त्वाचा पुरस्कार करणाऱ्या रोसोला सणसणीत टक्कर देऊन चीत करायला लेसिंग आपल्या अस्तन्या दर सारून पुढे सरसावला. लेसिंग हा मोठा दूरदृष्टी, चिकित्सक, आखाडेबाज आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा तत्वज्ञानी होता.
जगातल्या सर्व सुधारणा मैथुनातिक्रमाला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उत्तेजन देणाऱ्या असल्यामुळे त्या मानवजातीच्या संहारासच कारणीभूत होतात, असे प्रतिपादन करणान्या रोसोप्रभृति निराशावाद्यांना लेसिंगनें असा सवाल केला की, "सुधारणेच्या उच्च शिखरावर पोहचलेलें व मैथुनातिक्रमात भरकटलेले दिसणारे अथेन्स अखेर खाली कोसळले. पण त्याच्या ऱ्हासाला मैथुनातिक्रमच कारणीभूत झाला याला आधार काय? आणि मैथुनातिक्रमा - ( Psychopathia sexualis) मुळेच जर राष्ट्र नामशेष होतात असे गृहीत धरलें, तर जगप्रसिद्ध सद्गुणी स्पार्टाचा सत्यानाश का व कशाने झाला?" अखेर रोसोला कबूल करावे लागलें की सुधारणा होणें हा निसर्गाचा अनिवार्य धर्म आहे. या धर्माचा नाश केला तर मानवजातीच्या प्रवृत्ति रानटी व राक्षसी बनून मैथुनातिक्रमाची मर्यादाहि कांही कमी होणार नाही, मैथुनातिक्रम निसर्गाच्या बरोबरीनेच जन्मलेला आहे आणि तो आतांच फाजील झाला व पूर्वी तसा नव्हताच असे म्हणतां यावयाचें नाहीं, या गोष्टीचा रोसोच्या मनावर पूर्ण विचारांती चक्क प्रकाश पडला.
सुप्रसिद्ध भाषाशास्त्री मफनें या प्रश्नाची आपल्या What is Civilization?` (सुधारणा म्हणजे काय?) या पुस्तकांत चर्चा करतांना निर्णय काढला की "If civilization had not come, vice would still have been dominant, and that civilization, involving as it does intellectual progress, provides also the means for counter-acting vice" Ipp. 30, 31, Halle, 1880]
मानवी उत्क्रांतीचा इतिहास
नीट लक्षपूर्वक पूर्वग्रहविरहीत वृत्तीने वाचून मनन केला की आपल्याला एक गोष्ट चटकन उमजून येईल की पुराणमतवाद्यांच्या निराशावादाला त्यांच्या हेकेखोर व एककल्लीपणाखेरीज कशाचाहि आधार नाही. अत्यंत रानटी अवस्थेतून सुधारत सुधारत मनुष्य सांप्रतच्या उन्नत स्थितीला येऊन पोहचला आहे. कल्पनेच दुर्बिणीतून भविष्यकाळच्या प्रदेशाची पाहणी केली तर हीच उन्नतावस्था अधिकाधिक उज्वलच दिसेल आणि इतिहासाच्या सहाय्याने भूतकाळाच्या खोल खाणीत उतरून उत्क्रांत्यवस्थेच्या पायऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. तर हेच प्रत्ययाला येतें कीं जसेजसे खोल जावे तसतशा निकृष्ठावस्थेच्या ओबडधोबड पायऱ्या खडपे व सुळे आढळतात आणि जसजसे वर यावें तो तो त्या पायऱ्यांना काही विशेष प्रकारच्या घडणीचा संस्कार होत होत आजला त्यांना काहीतरी निश्चित स्वरूप आलेले आढळते. उत्क्रांतितत्वाचा एक मुख्य नियम असा आहे की मानवजातीच्या अनेक इंद्रियांची परिणति एकदम एकसमयावच्छेदें होत नसते. एकेक इंद्रिय क्रमशः परिणत होत जाते. ज्यावेळी घ्राणेंद्रियाची परिणति होत असेल तेव्हा त्याला पोषक व उत्तेजक असणाऱ्या विकारांचाच काय तो अंमल जोरात असतो. इतर इंद्रियें विकार व विचार ही संवेदना शून्यच असतात. ज्यावेळी माणसांत वासनेंद्रिय परिणत होत होते. त्यावेळी त्याचे ज्ञानेंद्रिय बधिरावस्थेत होते. त्यावेळच्या मानवी मैथुनप्रवृतीत आणि पश्वादिकांच्या कांहीहि फरक नव्हता. उलट सृष्टीनियमाविरूद्ध कर्म करण्यास प्राचीन काळचा मानवाचा कारटा मुळींच कचरत नसे. अर्थात् पशुपक्षादिकांच्या पोटी जन्मलेल्या पौराणिक व्यक्त्या एकतर काल्पनिक मानल्या पाहिजेत अगर या सृष्टीविरुद्ध मैथुनप्रवृत्तीच्या पर्यवसानांत त्या ढकलल्या पाहिजेत, याशिवाय तिसरा मार्ग नाही. परंतु मनुष्यप्राण्याची उत्क्रांती म्हणजे त्याच्या
ज्ञानेंद्रियाचा पूर्ण विकास
अथवा त्याच्या मेंदूची परिणति होय. मेंदु प्रगल्भ होऊं लागला की सहाजीकच त्यांची इतर इंद्रियें कमजोर होतात. ज्ञानेंद्रिय पूर्ण प्रगल्भ झाले की त्यालला पोषक व उत्तेजक अशाच विकारांची सेना हत्यारबंद होऊन त्याच्या पाठीशी उभी राहते आणि पूर्वीचे इतर सर्व काम्य विकार लुलेपांगळे बनतात. पुराणमतवादी चालू मन्वंतराच्या मैथुनातिक्रमाबद्दल कितीहि आदळआपट करीत उत्क्रांतीचा इतिहास आज छातीला हात लावून सप्रमाण पटवून देत आहे की ज्याअर्थी हल्ली मानवजातीचें ज्ञानेंद्रिय दिवसेंदिवस अधिकाधिक तीक्ष्ण व प्रगल्भ होत चालले आहे, *त्याअर्थी मनुष्याच्या हातून पशुतुल्य मैथुनातिक्रम होणेंच शक्य नाही. उलटपक्ष बुद्धि जसजशी तीव्र विकास पाऊं लागेल, तसतसा मैथुनप्रवृत्तीचा ओढाहि कमीकमी होत जाऊन, त्याला निमित्तमात्र कर्तव्याचे शुद्ध स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय खास राहणार नाही. एकूण सध्या सुसंस्कृत मानवी समाजात मैथुनातिक्रम पूर्वीइतका बलवत्तर नाही आणि आजला जो प्रेमातिरेक (Passionate Love) दृष्टीस पडतो, त्यात निव्वळ काम्य हेतूपेक्षा काहीतरी विशेष भावना उद्दीपित झालेली असली पाहिजे है निर्विवाद ठरते. मानवी प्राण्यांच्या उत्क्रांत्यव्यवस्थेच्या अगदी सुरुवातीला
प्रेम कशाशी खातात
हे मुळींच माहीत नव्हते, हा सिद्धांत प्रथम लबॉक नामक तत्ववेत्याने शोधून काढला. प्रेमात निसर्गतःच असणारे उच्च अध्यात्मिक तत्व मानव प्राण्याची मानसिक दशा प्रगल्भ व परिणत झाल्याशिवाय त्याला अवगत होणे कठीण सुसंस्कृत समाजातील मनुष्यांची काम्य प्रवृत्ति आणि अनाडी लोकांची पशुतुल्य व्यभिचारप्रवृत्ति यात असणारा ढोबळ भेद नीट परीक्षण केला तर या मुद्यावर अधिक लिहिण्याची जरूरच उरत नाही. अलीकडच्या सुशिक्षित मंडळींच्या प्रेमप्रवृत्तीची हेंटाळणी करताना किंवा विधवापुनर्विवाह असवर्गविवाहादि कृत्यांवर टीकांचा भडीमार करताना सोवळे पुराणमतवादी त्यांच्यावर
बेधडक व्यभिचाराचा आरोप
करतात आणि देशासंपन्न सोम्याजीनें तिरडीवर चढता चढता जरी एकामागून अनेक विवाह केले तरी ते अग्निहोत्राच्या सबबीखाली मात्र वेदोक्त आणि न्याय्य ठरवितात जणू काय या अग्निहोत्र्याची काम्यप्रवृत्ति अग्नीत जळून खाक झालेली असते आणि स्वतःचा पुनर्विवाह ते अग्निहोत्राच्या सांगतेकरिताच काय तो करतात.
परंतु सुशिक्षितांचे प्रणयी लग्न आणि अग्निहोत्र्याचे स्मृत्योक्त लग्न यांतील एक मोठा ठळक भेद वाचकांनी अवश्य लक्षांत ठेवावा, सुशिक्षित प्रणयी सुधारकाचा मुख्य कटाक्ष त्याच्या पसंतीस उतरलेल्या विवक्षित तरुणीशींच विवाह करण्यांत असतो. त्या विवक्षित तरुणीऐवजी दुसऱ्या कितीहि सगुणरूपसंपन्न तरुणी त्याला देण्याचे ठरवून त्याच्या प्रेमपात्र तरुणीचा नाद सोडण्याचा कितीहि आग्रह केला तर तो त्या आग्रहाला कदापिहि मान वाकवीत नाही.
विवाह करीन तर तिच्याशींच करीन
या प्रतिज्ञेला चिकटून राहण्याची त्यांची चिकाटी असते. अर्थात् या चिकाटीत निवळ काम्य प्रवृत्तीपेक्षा आणखी कांही तरी विशिष्ट भावना उद्दीपित असते हे निर्विवाद होय-मग त्या भावनेची जाणीव त्याला व्यक्त करून दाखविता येवो वा न येवो ! परंतु आमच्या अग्निहोत्र्यांना साठ्यांच्या गंगूऐवजी पेठ्यांची रंगू जरी आयत्या वेळी माळ घेऊन बोहल्यावर चढली तरी तिचें पाणीग्रहण करण्यास संकोच वाटत नाही. नगास नग मिळाला म्हणजे झालें! या तुलनेवरून काम्यप्रवृत्तीचा अग्नि सुशिक्षित प्रणयी तरुणांपेक्षा या अग्निहोत्र्यांच्याच पुनर्विवाह-प्रवृत्तीत अधिक भडाडलेला असतो, हे अधिक विशद करून सांगितलेच पाहिजे काय? सुप्रसिद्ध निसर्गशास्त्रवेत्ता कीलमेयर (Kielmeyer) म्हणतो की, Love is a tree, that it has its roots in the physical sphere, but that its branches extend high above the physical world, expanding more and more abundantly into the sphere of the spiritual " | Sex Life p. 5] निराशावादाने मेंदु सडलेल्या जीर्णमताभिमानी धादांत्यांना आधी मुळी मानवजातीच्या प्रगतीची धडधडीत दिसणारी साक्षच मान्य नाहीं, मग प्रेमांत अंतर्भूत असलेली उच्च अध्यात्म (Spiritual) भावना दिसणार कशी?
कलीयुगामुळें झालें धर्माचे वाटोळें ॥
हा त्यांचा पौराणिकी सिद्धांत ते अक्षयी आपल्या हृदयाशी घट्ट धरून बसले आहेत चालू युगाला सुद्धा कलीयुग हे नांव देऊन त्यांच्या काळेकुट्टपणाचा पुरावा देण्यासाठी ज्यांनी भविष्य पुराणांची जंत्री व्हिक्टोरिया राणीच्या कारकिर्दीपर्यंत (श्री वेंकटश्वर छापखान्यांत छापलेल्या भविष्य पुराणाच्या प्रतींत भविष्याची जंत्री एकोणिसाव्या शतकापर्यंत आणून भिडवलेली आढळते.) आणून मी त्यांच्या मनोवृत्तीवर पडलेल्या पातकी कल्पनांच्या डांबरीची पुटें कशी धुवून काढावी? तथापि विद्वान् शास्त्रवेत्त्यांनी याबद्दल जे निश्चित सिद्धांत काढले आहेत त्यांच्याशी वाचकांचा अल्प परिचय करून दिल्याशिवाय पुढे जाणे बरे नाहीं इयॉन ब्लॉक. एम. डी. हे आपल्या
`चालूं मन्वंतरांतील मैथुनप्रवृत्ति `
नामक ग्रंथांत (पृ. ५-६ ) खालील प्रमाणे विवेचन करतात :
"For the human sprit in the course of its development has become not merely lord of the elementary forces of Nature: it has become also lord and master, interpreter and guide, of the sexual impulse; for this impulse owes to the human spirit its new and peculiar life, its life capable of further development as manifested in the history of human love. The History of Love is the History of Mankind, of Civilization. For love manifests a continual progress, which can be denied by those only who have failed to understand the deep significance of human love in the entire civilized life of all times, and who, observing the persistence of the primeval and ever-active sexual impulse, elemental in its nature, are led only to a hopeless doubt as to the possibility of all love, and thus justify the pessimism with which Schopenhauer has condemned the significance of human sexual love. Undoubtedly this elemental impulse persists for ever, and to follow it alone leads to death, to utter desolation, to nothingness, as Tolstoi, Strindberg and Weininger, the bitter opponents of modern "love", have so vehemently declared. But did these men know true love? Had they become conscious of inevitable necessity with which civilization in the course of ages and generations had transformed the human sexual impulse into love as it now exists, transformed it in so idea of the development of love as it now exists, transformed it in so manifold and so wonderful a way? Had they any idea of the development of love, and of its place and its significance in history?
Let them believe this, these doubting and despairing souls nouthing has been destroyed of all the spiritual relations, of all the wonderful possibilities of development which have manifested themselves in the course of the long and varied history of the evolution of love. To describe this evolution, it is necessary to draw attention to all those elements of civilization which remain at present influential in love, but it is further indispensable to forecast their future development. Once again we stand at an important turning point in the history of love, an important turning point in the history of love. The old separates itself from the new, the better will once more be the enemy of the good. But love regarded, as it must now be regarded, in its inner nature, as a sexual implulse most perfectly and completely infused with a spiritual content, will remain the inalienable gain of civilization; it will stand forth ever purer and more promotive of happiness, like a mirror of marvellous clearness, wherein is reflected a peculair and accurate picture of the successive epochs of civilization."
या विस्तृत विवेचनावरून आपणांस सप्रमाण पटतें की मानवजाती ही दिवसेंदिवस उन्नत होत असून एकंदर परिस्थिति निःपक्षपणाने पाहिली तर निराशावादाला कोठे कसलाहि आधार "The way of the spirit in love becomes predominant pari passu with the development of mankind in civilization.........The transformation of the sexual impulse into passionate love represents the victory of the intelligence over the will." [do. p. 25] 3g शास्त्रवेत्यांचा सिद्धांत पाहिला की बीज आणि क्षेत्र शुद्धीचे अशक्य नियम लिहून काढून स्मृतींची बाडे भरून काढण्याचा रिकामटेकडा उपद्व्याप आमच्या स्मृतिकारांनी का व कशाला केला कोण जाणे, असे वाटू लागते. उलटपक्षी आपल्या तीक्ष्ण दूरदृष्टीची (?) चालती बोलती स्मारक म्हणून आपल्याला स्मृत्या लिहून ठेवण्याचा त्यांनी जो महत्वाकांक्षी उपक्रम केला, तो काही काळपर्यंत बौद्धिक गुलामगिरीत सडत पडलेल्या हिंदूंनी जरी मान्य केला, तरी विसाव्या शतकातील शास्त्रीय शोधांनी त्यांच्या स्मृतिवचनांतला पोकळपणा चव्हाट्यावर नागवा उघडा केल्यामुळे या स्मृतिकारांची स्थिति सांप्रत अत्यंत शोचनीय झालेली आहे.
* * * *
[१८] बीज आणि क्षेत्राच्या शुद्धीबद्दल एवढा मोठा कडेकोट बंदोबस्त करणान्या स्मृत्यांचा आणि स्मृतिकारांचा जन्म होण्यापूर्वीच्या आर्यांची सामाजिक स्थिति, कोणत्याहि प्रकारचे समाजनिर्बंध नसतांनाहि. जर उत्कृष्ट असल्याची साक्ष इतिहास देत आहे, तर पुढेच या स्मृतिकारांनी बीजक्षेत्र शुद्धीचीं लचांडें निर्माण करून काय पुण्यांश साधला? यावर उत्तरपक्ष असा आहे की दस्यू लोकांच्या सानिध्यांत जेव्हां आर्यलोक आले, तेव्हा त्या नीच मानल्या गेलेल्या लोकांच्या रक्ताची आपल्या रक्तांत सळमिसळ होऊ नये म्हणून (The pioneers of Indo Aryan civilisation, like their fellow Aryans in Southern Europe, won their way even more effectually by their superior intellectual qualities than by their fighting strength. Though for many centuries holding themselves proudly aloof from the non-Aryan races and jealously guarding their spirtual inheritance from profanation by the uninitiated, their laws, political institutions and religions ideas gradually became, for the vast majority of the people, the warp and weft of Indian life, even for the millions is whose veins no trace of Aryan blood can now be found...................ven among those who called themselves Aryans there were many of mixed blood. It was by spiritual rather than physical ties that Aryans and non-Aryans were gradually bound together into a political unity with an abiding sense of nationality. Aryan) स्मृतिकारांना ही बीज क्षेत्रशुद्धीची कुंपण मुद्दाम तयार करणे भाग पडले. आर्य जेते होते आणि दस्यू जित होते, तेव्हां अशा प्रकारचा कांहीं निर्बंध जर खरोखरच ऋग्वेदकाळी अंमलात आणण्याचा प्रयत्न झाला असेल. (त्यावेळी तो झाला नाहीं हें सिद्धच आहे) तर त्यांत अस्वाभाविक असे काहीच नाहीं. परंतु यावर अशी शंका येते कीं खुद आर्याची तरी उत्पत्ति बीजक्षेत्रशुद्धीच्या सवय खाणीतून झालेली होती काय? या प्रश्नाला नास्तिपक्षीच उत्तर देणें भाग पडते.
बरें, इतिहास पाहिला तर शहाण्या स्मृतिकारांनी ठरविलेल्या नीचयोनिजात पुरुषांनी व स्त्रियांनी मोठमोठे पराक्रम गाजविल्याचे स्पष्ट दिसतें. असें जर आहे तर,
ब्राह्मण्यां क्षत्रियात्सूतो वैशयोर्द्वदेहिकस्तथा ।
शूद्राज्जातस्तु चाण्डालः सर्वधर्मवहिष्कृतः ।। १-९३ या स्मृ
हा निर्बंध स्मृतिकारांनी कोणत्या आधारावर ठरविला ? आमची तर पक्की खात्री आहे की हल्ली जसे महाराष्ट्रीय राजकारणाच्या क्षेत्रांत
टिळकद्रोही तो देशद्रोही
हे एक राष्ट्रीय स्मृतिवचन सर्वत्र बोकाळले आहे. तसल्याच हलकट मनोवृतीतून वरच्यासारखी वचने निर्माण झालेली आहेत. या पलीकडे त्यांना कवडीचीहि किंमत देता येणें शक्य नाही. अरसिक स्मृतिकारांनी काही स्वार्थी चळवळ्यांच्या गुप्त कारस्थानास बळी पडून अनुलोम विलोम प्रतीचे काल्पनिक व अशास्त्रीयता स्मृतिप्रथांतून मनमुराद पेरून ठेवण्याऐवजी स्त्री-पुरुष- परस्पराकर्षण का व कसे होते याचा थोडे श्रम घेऊन नीट अभ्यास केला असता तर शूद्रमर्दापासून ब्राह्मणस्त्रीला झालेल्या पुत्राला चांडाळ ठरवून त्याच्या टाळक्यावर सर्वधर्मबहिष्कृतः ची पाटी मारण्याचे पोरकट कृत्य त्यांच्या हातून घडतेच ना ! शिवाय असा एक साधारण नियम आहे की कायद्यांच्या पुस्तकांत ज्या ज्या अपराधांना शिक्षा सांगितलेल्या असतात, ते ते अपराध लोकांकडून घडत असतात. नुसते कायदे करून किया अपराध्यांना तुरुंगातले पोपट बनवून जनता कधीं सुधारत नसते, हे तत्व अझूनहि प्रिझन कमिशनच्या खुर्च्या खतविणाऱ्या बृहस्पतींना जर उमगत नाही, तर ज्यावेळी
हिंदुस्थान म्हणजेच सारे जग
असल्या कूपमंडकी कल्पनेत बुद्धिसर्वस्वाची घमेंड मारणारे स्मृतिकार भिक्षुकी मतवर्चस्वाचे गुलाम बनून आपापल्या स्मृतींची बांडे खरडीत बसत त्यांना कोठून समजणार ? शिक्षा हा काही सुधारणेचा उपाय नव्हे आणि निसर्गाच्या नियमाने आईबापांच्या पोटी जन्माला येणें हा काही गुन्हा नव्हे! गुन्हाच मानायचा तर फार झालें तर तो आईबापांवर कदाचित् लादता येईल. पण त्याचे प्रायश्चित्त त्यांच्या मुलांना काय म्हणून? बालविधवांचे पुनर्विवाह करायचे नाहीत. साध्या माणुसकीचेहि हक्क त्यांना द्यायचे नाहीत, त्यांच्या सर्व महत्त्वाकांक्षांची दडपशाही निर्दयपणानें पोळपाट लाटण्याच्या गुलामगिरीत करायची आणि त्यांनी अशा अमानुष कचाट्यात निसर्गाच्या शुद्ध उमाळ्यानें काम्य मार्गाचा अवलंब करून पोटी जन्माला येणाऱ्या निरपराधी अर्भकाला जनापवादाच्या क्रौर्याला भिऊन पंढरपूरच्या चंद्रभागेत किंवा नाठाळ नाशकाच्या गोदेंत
न कांपितां नाळ स्वाधीन केला
आणि अशाहि स्थितीत त्या अनाथ अर्भकांचे संगोपन प्रार्थनासमाजीय एका बालसंगोपन संस्थेनें केलें, तर यांत कोण, कसा व का दोषी ठरतो याचा विचार बायकोशिवाय अग्निहोत्राच्या शेगडीतल्या गोवऱ्यांची राख थंड होत चालली हो! म्हणून चौपदरी गळा काढून रडणाऱ्या नाशिक पुण्याच्या ब्रह्मसमंधांनी केला पाहिजे. शूद्रबाप आणि ब्राह्मण आईच्या पोटी जन्माला येणारा प्राणी चांडाळच असतो की ब्राह्मणांनाहि ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत चीत करणारा पंडीत असतो. हे तत्व निदान आता तरी अनाथबालसंगोपनालयांनी स्पष्ट सिद्ध करून दाखविलें आहें आणि या दिशेने प्रयत्न करण्यात अग्रेसर म्हणून आमच्या देशांतील ब्राह्मणबुवांपेक्षाहि ख्रिस्ती मिशनऱ्यांनाच सर्व श्रेय देणें अधिक न्याय्य आहे.
जोपर्यंत असवर्ग संबंधाची प्रजा हिन्दु धर्माच्या क्षेत्रांत प्रामाणिक धर्माभिमानाने राहते तोपर्यंत ती चांडाळ किंवा शूद्र नांवाखाली अस्पृश्य, अदर्शनीय व धर्माचरणांतहि अनधिकारी ठरविली जाते आणि त्याच प्रजेनें
क्रिस्ती धर्माचा बाप्तिस्मा घेतला
की तीच स्पृश्य, दर्शनीय आणि यातील काही व्यक्ती अनुवंशिक संस्काराच्या जोरावर अंगीकृत गुणकर्माचा पूर्ण विकास होऊन श्रेष्ठ दर्जाला पोहचतांच-पूजनीयहि ठरतात.
या एकाच सिद्ध गोष्टीवरून आमच्या स्मृतिकारांचे स्मृतिनिर्बंध असनातन, असत्य, फोल आणि कुचकामाचे ठरत नाहीत काय? अर्थात् जे निर्बंध सनातन नाहीत, सत्याच्या आणि प्रत्यक्ष प्रमाणांच्या कसोटीला उतरत नाहीत, त्यांचा सनातन धर्मात समावेशहि होऊ शकत नाही. म्हणूनच ब्राह्मणांनी ब्राह्मणांकरिता स्वतःचे आत्मस्तोम माजविण्याकरिता लिहिलेल्या नानाविध
स्मृत्यांचा समावेश धर्मात होत नाहीं.
अगदी अलीकडच्या इतिहासात नातू चिंतामणराव सांगलीकर, निळकंठभट थत्ते यमाजी शिवदेव वगैरे मूर्तिमंत चांडाळ व्यक्तींची चरित्रे पाहिली की ब्राह्मणत्व किंवा जन्मावर तरविणाऱ्या स्मृतिकारांची ज्याला कीव येणार नाहीं तो मुक्तोऽथवापसूच असला पाहिजे खास आणि या व्यक्त्या ब्राह्मणच होत्या असें कंठरवाने प्रतिपादन करणारे आधुनिक प्राणीसुद्धा चांडालत्वाच्या गुणधर्मापेक्षा अधिक वरच्या पायरीत अझून उत्क्रांत झालेले नाहीत, असेहि म्हणणे प्राप्त होते. अनुलोम प्रतिलोम प्रजाजनांच्या नियमांच्या फोलकटपणाप्रमाणेच चांडाळांची मुलें चांडाळच निपजतात की काय या प्रश्नांनाहि या अनाथ बालसंगोपनाश्रमांनी सक्रीय उत्तर दिलें आहे. अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट् यानें आपल्या Cosmos नामक ग्रंथाच्या प्रस्तावनेत असा एक शास्त्रीय सिद्धांत काढला आहे की " Sensual impressions and apparently chance occurrences are, in the case of youthful emotional individuals, often capable of determining the entire of a human life." लहानपणी कोमल मनांवर होणारे बाह्य स्थितीचे परिणाम जरी कालवशात् आपण विसरून जातों, तरी त्यांची आपल्या आत्मविषयक (psychical) प्रकृतीवर उमटली जाणारी मुद्रा कधींच पुसली जात नाही एवढेच नव्हे, तर आपल्या भावी आयुष्यांतील सर्व प्रकारची बरी वाईट संस्कृति या मुद्रेनेंच घडवून आणलेली असते, ही गोष्ट आपण मुख्यतः लक्षांत घेतली पाहिजे. बालपणचे संस्कार हे मनुष्याच्या देवाची घटना करणारे कारागीरच होत. गुन्हेगार जातीतली मुले गुन्हेगारच का निपजतात? ती गुन्हेगार आईबापांच्या पोटी जन्माला येतात म्हणून नव्हे, तर बाळपणीं तीं गुन्हेगारांच्या वसतीत, गुन्हें करण्याचीच प्रवृत्ति जेथे रात्रंदिवस विशेष प्रचलित आहे अशा परिस्थितीत वाढविली जातात आणि गुन्हें करण्याच्या प्रवृत्तीचा परिणाम त्यांच्या मनावर फार खोल आणि कायमचा होतो म्हणून, परंतु या मुलांना चांगले शिक्षण दिल्यास त्यांची गुन्हे करण्याची प्रवृत्ति एकाच जन्मांत नाहींशी होते आणि या गुन्हेगारांच्या समाजातूनसुद्धां नामधारी
ब्राह्मणांच्या तोंडात मारणारे ब्राह्मण्य
गाजविणारे ज्ञानी निर्माण होतात, ही गोष्ट अनाथ बालकाश्रमांनी आतां अगदी स्पष्टच सिद्ध करून दाखविली आहे. तेव्हा जन्मावरून जाती ठरविणाऱ्या स्मृतिकारांच्या बेअक्कलपणाची साक्ष यापेक्षा अधिक ती कोणती? व बीज आणि क्षेत्र शुद्धाशुद्धतेचा मामला डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या शहाण्यांच्या पोकळ डोक्यांची तारीफ तरी किती करावी? स्मृतिकारांचे हे स्मृतिनिबंध म्हणजे त्यांच्या मागुसकीच्या अभावाची चालती बोलती प्रदर्शनं म्हटली पाहिजेत. या निर्बंधांनी हिन्दु धर्माचा खून केलेला आहे. या निर्बंधांनी हिंदु समाजाचा लोकसंग्रहदृष्ट्या भयंकर ऱ्हास केल्याचे अघोर आणि अक्षम्य पातक केले आहे. या स्मृतिकारांनी हिंदु राष्ट्राचे राष्ट्रीयत्व खच्ची करून, त्याला आजला सर्वच बाबतीत पूर्ण नपुसंक बनवून सोडलें आहे. श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी या प्रश्नाची फारच मार्मिक चिकित्सा केली आहे. ते म्हणतात---
"ज्या सामाजिक निर्बंधांमुळे आमच्या समाजांत पारियापासून ब्राह्मणांपर्यंत एकाहून एक हळू हळू उंच होत गेलेल्या, अशा असंख्य जाती निर्माण झाल्या आहेत, ते निर्बंधच मुळीं सर्वस्थी अन्यायाचे आहेत. ह्या निर्बंधामुळे, स्वभावतःच एका योग्यतेचा असणाऱ्या मनुष्यप्राण्यांत उच्चनीच भाव मानण्यांत आला आहे. व त्यांच्या जाती करून टाकल्या आहेत : आणि अशा या जातीची इमारत गुणकर्माच्या पायावर न उभारतां, केवळ जन्माच्या तत्वावर रचलेली आहे. म्हणजे, एखादा मनुष्य यदृच्छेने श्रेष्ठ मानलेल्या जातीत जन्माला आला, तर तेवढ्याच कारणामुळे कनिष्ठ मानलेल्या जातीत जन्म पावणाऱ्या मनुष्यापेक्षा त्याची योग्यता अधिक आहे, असे गृहित धरले जाते. समाजांत आपले महत्व वाढावे, म्हणून जातीजातीत जे तंटे निरंतर चालू आहेत, ते परस्परांमधिल वैमनस्य कायम ठेवण्यास कारणीभूत होतात."
परंतु, याहिपेक्षा हिंदु राष्ट्राचें लोकसंग्रहदृष्ट्या जे नुकसान पूर्वी झालें. सध्या होत आहे आणि हे स्मृतिनिर्बंध हिंदूनी जर लवकर फासावर चढविले नाहीत तर पुढेहि होत राहणारें नुकसान या जगतितलावरून हिंदूंना सफाई नामशेष केल्याशिवाय खास राहणार नाही. मुसलमानी अमदानीत इस्लामी धर्मछळामुळे परधर्मात गेलेल्या हिंदूच्या संख्येपेक्षा हिंदूच्याच धर्मछळामुळें मुसलमानी गोटांत गेलेल्या हिंदू बांधवांची संख्या अधिक भरते. आजलाहि क्रिस्ती गोटांत जाणान्या हिंदूंना हिंदूंचा धर्मछळच विशेषतः कारण होत आहे. एकट्या मद्रास इलाख्याकडे पाहिलें तरी हेच दिसून येतें कीं " गेल्या चाळीस वर्षांत नुसत्या तेलंगणात सुमारे दोन लाख पन्नास हजार पंचमांनी ख्रिस्तीधर्म स्वीकारिला आहे. याशिवाय एकट्या त्रावणकोरात एक लाख पंचम ख्रिस्ती झाले आहेत ते निराळेच "हिंदुस्थानांतील असंतोष, पृ. ३१३) मग आसेतुहिमाचल हिंदुस्थानांत हा
धर्मांतराचा वणवा
केवढा भडकलेला असेल याची वाचकांनी कल्पना करावी हे बरे. अर्थात हि वणव्याची होळी अखंड अखंड धडाडत ठेवण्यास आमच्या अदूरदृष्टी स्मृतिकारांचे स्वार्थी निर्बंध आणि त्यांना डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या अक्कलशून्य धर्ममार्तडांचे पापी थेरच जबाबदार धरणें प्राप्त आहे. मुसलमान किंवा क्रिस्ती मिशनऱ्यांना दोष देण्यापेक्षां त्यांनी-धर्मांतराच्या रूपानेच का होईना ! आमच्यातील बऱ्याचशा हिंदू भावंडांच्या गळ्याला लागलेला
बौद्धिक गुलामगिरीचा फांस
तोडून त्यांचा ऐहिक उन्नतीचा मार्ग खुला करून दिला आणि भिक्षुकी जुलमांतून त्यांची कायमची सुटका केली, याबद्दल कोणी झाला तरी त्या मिशनऱ्यांचे आभारच मानील, मद्रासच्या पंचमांनी क्रिस्ती धर्माचा स्वीकार करताच त्यांची उन्नति कसकशी होत आहे, याबद्दल तेलगू मिशनच्या एका रिपोर्टातील उतारा पहा :--
" गेल्या चाळीस वर्षात झालेल्या नैतिक व धार्मिक सुधारणेकडे जर आपण लक्ष पोहचविलें, तर मिशनरी लोकांच्या कामाचा परिणाम पाहून मनाला मोठा धीर वाटतो. पंचम लोक स्वभावतःच दरिद्री, घाणेरडे व अडाणी आहेत आणि शेंकडों वर्षे जुलमाखाली चिरडत आल्यामुळे, त्यांच्या आंगीं कांहीं विशेष प्रकारचे दुर्गुण जडलेले असून, त्यावरून त्यांच्या नीच स्थितीचा व दास्यत्वाचा बोध होतो, हे अगदी खरे आहे. परंतु त्यांच्या बाबतींतील अत्यंत आशाजनक गोष्ट अशी आहे की, आपल्या नीच स्थितीची त्यांना पूर्ण जाणीव असून, त्यांतून सुटण्यास ते फार उत्सुक आहेत आणि म्हणूनच त्यांच्या कल्याणाविषयी कळकळ बाळगणाऱ्या व कर्तृत्ववान अशा शिक्षकांच्या देखरेखीखाली त्यांच्याकरितां मंडळचा स्थापन केल्या, तर त्यांच्या सांपत्तिक, बौद्धिक व नैतिक स्थितीत परिछिन्न सुधारणा दिसून येऊ लागते त्यांचे गाढ अज्ञान नाहींसें होतें ते आपली शरीरें व राहण्याची घरे वगैरे जास्त स्वच्छ व नीटनीटकी ठेऊ लागतात गुरांना विष घालणें व शेतांतील धान्याची चोरी करणें, या दोन गुन्ह्यांकडे त्या लोकांची विशेष प्रवृत्ति असते, ती ते सोडून देऊ लागतात बालविवाह व वेश्यागमन ह्या ज्या वाईट चाली बहुतेक हिंदू लोकांत पडल्या आहेत, त्यांचा ते लोक त्याग करूं लागतात: आपल्यापेक्षां उच्च जातीतील लोकांपुढे नाक घांसून आपण नेहमी वागले पाहिजे, अशी जी त्यांच्या मनाची समजूत असते, तिचा जोर बराच कमी पडतो; आणि आपण मनुष्य प्राणी असल्यामुळे, आपले हक्क काय आहेत व त्याबद्दल आपणांस कसा अभिमान वाटला पाहिजे, ह्याची जाणीव त्यांच्या ठिकाणी उत्पन्न होते. भोवतालच्या परिस्थितीतून जर त्यांना आपली सुटका करुन घेतां आली तर आपल्या देशबांधवांपैकी जे उत्तम म्हणून गणले गेले आहेत, त्यांच्यापेक्षां बुद्धीने आपण यत्किंचितहि कमी नाही, असे जगाच्या निदर्शनास ते लोक आणून देतात. विशेषतः मिशनरी लोकांनी स्थापन केलेल्या या शाळांस बोर्डिंगें जोडलेली असतात, त्या ठिकाणी वरील प्रकार फारच चांगल्या रीतीनें दृष्टीस पडतो. अशा वसतिगृहांतील पंचमांची मुलें ब्राह्मणलोकांच्या मुलांच्या बरोबरीनें विद्या संपादन करीत असतात आणि कांहीं मुलें तर खरोखरच ब्राह्मणांच्या मुलांना मागेहिं टाकतात." हिंदुस्थानातील असंतोष पृ. ३१४-३१५ सामाजिक आणि धार्मिक जुलमांच्या बाबतीत मद्रास इलाखा साऱ्या हिंदुस्थानांत पहिल्या नंबरचा नाठाळ म्हणून ठरला आहे. तिकडील ब्राह्मण इतके मस्तवाल आहेत की त्यांना इतिहासात तोडच दाखवायची तर महारामांगांच्या गळ्यात मडकी अडकविणाऱ्या पुण्याच्या चित्पावन पेशवे नोकरशाहीच्या अमदानीतील भटांचीच होय. हल्ली इंग्रजी रियासतीत जरी हे भटमंडळ
अळवाच्या भाजीपेक्षां पातळ
झालेलें आहे, तरी रत्नागिरी जिल्ह्यात असून चालू असलेली त्यांची सोवळी घाशीरामी त्रावणकोरातल्या राजमान्य ब्राह्मणी जुलमाच्या थोबाडीत मारीत असते. श्रावणकोर संस्थानांत नेहमी असे दृष्टीस पडते की, कोर्टात खटला चालू असता, एखाद्या पंचांची साक्ष घेण्याची पाळी आली, तर ब्राह्मण न्यायाधीश व ब्राह्मण वकील यांस विटाळ होऊ नये म्हणून अशा साक्षीदारास न्यायासनापासून सुमारे १०० कदमवर उभा करितात. आणि मग, न्यायाधीश व तो पारिया (पंचम) साक्षीदार ह्यांच्यामध्ये ठिकठिकाणी शिपाई अथवा निरोपे उभे करून, त्यांच्यामार्फत साक्षीदारांचे सवाल-जबाब होत असतात." ( हिंदुस्थानांतील असंतोष. पू. ३१२) वाहवा रे त्रावणकोरी ब्राह्मण्य ! आणि धन्य ती त्रावणकोरी ब्राह्मणी राजसत्ता !!
* * * *
[१९] आता आपण स्त्री-पुरुष- परस्पराकर्षण कसे व का होते या तत्वाचा शास्त्रीय दृष्ट्या विचार करून, बीजक्षेत्रशुद्धीच्या पाखंडी पुराणावर काही उजेड पडतो की काय ते पाहू स्त्रीपुरुषपरस्पराकर्षण तीन गोष्टींना घडून येतो :
(१) Attraction आकर्षण किंवा चित्ताकर्षण, (२) Attention एकतानता आणि (3) Affection प्रेमोग्दम यातली पहिली पायरी आकर्षणाची आहे आणि आकर्षण Like attracts like` समानतुल्य प्रवृत्ती वाचून घडून येत नाही वाटेल त्या प्रवृत्तीच्या मनुष्याचे चित्त हिरावून नेणाऱ्या आकर्षक स्त्रिया जरी पुष्कळ असल्या, तरी त्यांच्या दर्शनापासून फार झाले तर एकपक्षी आकर्षण होते, पण परस्पराकर्षण होत नाही. म्हणजे वेळी एखाद्या पुरुषांला पाहून जर एखाद्या स्त्रीचे मन आकर्षित झाले, तर त्याच वेळी त्या पुरुषाचीही स्थिति तशीच विद्ध होईल असे नाही. यांचे कारण त्यांच्या परस्पर मनोवृत्ति समसमान प्रवृत्तीच्या म्हणजे एकजिनसी नसतात. परंतु ज्या वेळीं स्त्रीपुरुषांचे परस्पराकर्षण वरील तीनहि स्थितींतून चढत चढत त्यांचे पूर्ण प्रेमविकासात पर्यवसान होते, तेव्हा ती स्त्रीपुरुषे लौकीकी दृष्ट्या कसल्याही उच्च नीच दर्जाची असली, तरी ती समान मनोधर्माची समसमान स्वभावाची व एकजिनसी परिणता व्यवस्थेचीच असतात. उदाहरणार्थ, एखाद्या महारणीची व वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणाची गट्टी जमली, तर ती महारीण महारीणहि नव्हे व तो ब्राह्मण ब्राह्मणही नव्हे, त्यांच्या परस्पर संस्कृतीचा पारा एकाच हिंदूवर आलेला असला पाहिजे त्या शिवाय त्यांची परस्पर मनोवृति वरील तीन स्थितीतून एकसमयावच्छेदें परिणत होत होत ती दोघे एकमेकांशी प्रेमबद्ध होऊ शकणारच नाहीत. अलीकडे उच्चवर्गीय म्हणविणाऱ्या कांही समाजांतून नीचवर्गीय समाजासारखी दिसणारी मुले जन्माला येत आहेत आणि नीच समाजात उच्चवर्णाप्रमाणे स्पष्टस्पष्ट दिसणारी स्त्री-पुरुष आढळत आहेत, याची कारणे काय असावी हे अधिक स्पष्ट करून सांगायला नको. अर्थात जेथे स्त्री-पुरुष-परस्पराकर्षण निसर्गप्रवृत्तीच्याच जोरावर सदैव घडत असते व सनातन असेच घडत राहणार, तेथे.
बीजक्षेत्र शुद्धीचे मानवी कायदे
करून त्यांच्या जोरावर निसर्गाला आडविण्याचे कर्म दुष्कर जरी असले तरी मूर्खपणाचे आहे खास निसर्गाला विवेकाचा बंध पाहिजे खरा, परंतु त्याला कायद्याचा सफेदा चढवून त्याची बळजबरीने अंमलबजावणी करू लागले की मग मात्र डपशाहीच्या प्रत्येक कायद्याला अंमलबजावणीप्रमाणे निसर्गप्रवृत्ति खवळून जाऊन कायदेबाज
विवेकाला चारी मुंड्या चीत
केल्याशिवाय कधींच राहणार नाही. उटल्या बसल्या स्मृतींचा आधार दाखविणाऱ्या ब्राह्मणांनी तरी हे स्मृतिनिर्बंध अक्षरशः आचरणात आणल्याचे दिसत नाहीं, आणि ब्राह्मण्याची जरतारी लाल शालजोडी पांघरून त्यांनी सत्तामदाच्या धुंदीत स्मृतिनिर्बंधांची ब्राह्मणेत्तर समाजांवर अत्यंत निर्दयपणाने बळजबरी केली, तरी तेहि स्वतः इतर मानवांच्या कारट्यांप्रमाणें मलमुत्रोत्पन्न माणसेच असल्यामुळे तोंडानी जरी त्यांनी मनु याज्ञवल्क्याच्या भिक्षुकी स्मृत्या घडघड तोंडपाट म्हणण्याचा पोपटी धंदा चालू ठेवला, तरी मैथुनातिक्रमात तेहि इतराप्रमाणें निसर्गप्रवृत्तीचेच दास बनलेले आहेत. हे त्यांच्या वर्तमान समाजस्थितीवरून चांगलेच सिद्ध होत आहे. बाह्य वर्तनाचा झगझगीत पडदा किंचित् दूर सारून पहातांच, हल्ली कोणत्याही समाजाला उच्च व नीच ठरविण्याचें धाडस करवत नाही, इतकी त्यांची अंतरावस्था व अंतर्व्यवस्था सारख्या प्रमाणावर येऊ न बेतली आहे. मानवांचे स्वार्थी स्मृतिनिर्बंध शूद्रपुरूष आणि ब्राह्मणस्त्री यांच्या संमीलनाला खुशाल विषमविवाह किंवा आणखी दुसरे कसलेहि नांव देवोत, निसर्गाच्या नियमांप्रमाणे तोच समविवाह ठरत असतो. हे एवढया विवेचनावरून वाचकांच्या लक्षात येईल. शिवाय आणखीहि एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षांत ठेवला पाहिजे. कोणताहि गुन्हा एकदोन व्यक्तींच्या हातून घडतांच, त्या गुन्ह्याला शिक्षा सांगणाऱ्या कलमांची कायद्यांच्या प्रथांत ताबडतोब योजना करीत नाहींत, त्यावेळी गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याच्या जवळजवळ साम्य असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यांच्या कलमाप्रमाणे न्यायाधीश शासन करतो.
परंतु विशिष्ट गुन्ह्याच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या समाजांत घडू लागल्या म्हणजे मगच त्या गुन्ह्याच्या कलमांची योजना देशांचे शासन-मंडळ कायद्याच्या ग्रंथांत करते. मुंबई इलाख्यांत धुम्रपानाचा अतिरेक होऊन घरोघर आणि दारोंदार
आबालवृद्ध चिमण्यांच्या तोंडांतून धूर
नव्हे, धुराचा डोंबाळा, रात्रंदिवस भडकू लागला, तेव्हांच ‘जुवेनाईल स्मोकींग बिल’ - लहान मुलाच्या धूम्रपानाला प्रतिबंध करणारा कायदा येथल्या कायदे कौन्सिलांत नामदार कंपूनी आणला. याच नियमांप्रमाणे, अनुलोम प्रतिलोम विवाहाचा कडकडीत निषेध करणान्या स्मृत्यांच्या अमदानीत या विवाहांचा धूमधडाखा चालू असला पाहिजे खास आणि मनुस्मृतीची उत्पति जगाच्या उत्पत्तीच्याही पूर्वी झाले असे घसा फोडफोडून सांगणाऱ्या शहाण्यांना हेंहि अर्थात् कबुलच करणें प्राप्त आहे की ही अनुलोम प्रतिलोम विवाहाची खेकटी सृष्टयुत्पत्तीच्याहि पूर्वीच आहेत. (सृष्ट्युत्पत्तीपूर्वी हे विवाह कोणकोणात लागत असत हे या शहाण्यांनीच सांगितलेले बरे.) मग संकर आतांच होत आहे या रडगाण्यांत हाशिल काय ? परंतु
संकराचे रडगाणें म्हणजेच धर्मप्रेम
अशी ज्यांची ठाम समजूत. त्यांची समजूत कशाने घालता येईल ? भिक्षुकी स्मृत्यांची उत्पति हजारों वर्षाच्या संख्येवर टिंबें चढवीत चढवीत ब्रह्मदेवाच्या बेंबीत नेऊन भिडविणाऱ्या बृहस्पतींना मानवी समाजाच्या उत्क्रान्तीचे भोपळ्या एवढे ज्ञान असतें, असें मानणे प्राप्त आहे. मानवी समाजाला कायद्यांची आवश्यकता का, केव्हा आणि कशी लागते, कायद्यांची घटना कसकशी होत जाते इत्यादि प्रश्न हे स्मृतिप्रिय प्राणी कधीच विचारांत घेत नाहीत, वास्तविक पाहिले तर प्राश्चात्य देशांतील ‘रोमन लॉ’ आणि आमच्याकडील ‘स्मृतिनिर्बंध’ यांत एक जबरदस्त भेद आहे, तो हाच की पहिल्याच्या घटनेत लोकसत्तेचा अंश अधिक पडल्यामुळे तो प्रत्यक्ष व्यवहारक्षम बनला आणि दुसऱ्यात लोकमताची पर्वा न करणाऱ्या मूठभर
वेदोनारायण शाईस्तेखान
भिक्षुकांच्या मतांचाच अंश पूर्णत्वाने पडल्यामुळे, स्मृतिनिबंधांचे स्वरूप अव्वलपासून अखेरपर्यंत शुद्ध शिफारसवजाच राहिले. स्मृतीत कितीहि निर्बंध ग्रथित केलेले असोत त्यांवर राज्यमान्यतेचा अगर लोकमान्यतेचा शिक्का कधींच पडला नाहीं, ही एक लक्षांत ठेवण्यासारखी ऐतिहासिक महत्वाची गोष्ट आहे.
* * * *
(२०) बीजक्षेत्रशुद्धिवाल्यांचा आणखी एक प्रामाणिक मुद्दा आहे ही बीजक्षेत्रशुद्धिच्या निर्बंधांच्या अभावी समाजांत मैथुनातिक्रम वाढला तर तो राष्ट्राच्या ऱ्हासाला कारण झाल्याशिवाय रहाणार नाहीं. नीतिमत्ता बलवत्तर नसेल तर राष्ट्र कधींच थरारणार नाही आणि मैथुनातिक्रम हा नीतिमत्तेचा घात करणारा असल्यामुळे, तो फारच वाढल्यास राष्ट्रहि त्याच्यामुळे रसातळाला गेल्याशिवाय रहाणार नाहीं. या विधानातील नीतिमत्ता मैथुनातिक्रम हे दोन शब्द फारच लवचिकपणानें वापरण्यात आलेले असतात, मैथुनातिक्रम कशाला म्हणतात व तो सांप्रत होत आहे की काय ? या प्रश्नांचा उहापोह मागे केलाच आहे. त्याची पुनरुक्ति येथे नको. नीतिमत्ता कशाला मानावी आणि नीतीची मूलभूत तत्त्वें काय असावी, याची सार्वत्रिक (Universal) कल्पना अजुनही ठाम ठरलेली नाही. जी एकाला नीति वाटते, तीच दुसऱ्याला अनीति वाटते. प्राचीन काळचे कडकडीत
कर्मठ ब्राह्मण गोमांसभक्षक होते,
आतांच्या काही ब्राह्मण ब्रुवांना डोळ्यावरच्या रांजणवाडीला सुक्या बोंबलाचा तुकडा शिववितांना सतरा वेळा नाक मुरडण्यात ब्राह्मणपणा वाटतो, तर कित्येकांना पाण्यातली शुद्ध मासळी सपाटून खाणे हाच ब्राह्मणपणाचा ट्रेडमार्क वाटतो. आमच्या इकडे अक्षता बालिकेला वैधव्य आलें असतां, तिला दुसरा नवरा करून देणें म्हणजे आमच्या कर्मठांच्या टाळक्याची शीर ठणठणूं लागते, तर तिबेटांत एका बाईला एकाच वेळी दहापासून तेरा नवरे करण्याची वेदोक्त परवानगी हीच नीति गणली जाते दक्षिणी ब्राह्मणांना कराच्या शेंडी ठेवण्यात शुचिर्भूता वाटते, तर मद्रासी ब्राह्मणांना दररोज
शेंडी दाढीमिशीचें सक्षौर मुंडण
केल्याशिवाय ब्राह्मणी नीतिमतेच्या गुळगुळीतपणाची खात्री पटत नाही आधुनीक सुविध लोकांनी वैश्यागमन मानलेले असताहि आमच्या इकडील नाशीक पंढरपुरच्या क्षेत्रस्थ भटांना साळू मैना चिमण्यांचा सहवास त्यांच्या ब्राह्मण्याच्या विरुद्ध आहे. एवढी साधी गोष्टही उमजत नाही. हिंदूना
एका जिवंत पत्नीच्या उरावर दहा सवती
करण्याची परवानगी धर्मशास्त्र खुशाल देते, तर युरोपिअनांचे स्मृतिशास्त्र जिवंत पत्नीशी काडी मोडल्याशिवाय कोणत्याही जॉनला मिस जेनचे प्राणीग्रहण करून देत नाही. युरोपिअनांत ‘शेकहॅन्ड’ प्रमाणेच चुंबन विधिचा फारसा विधिनिषेध मानला जात नाहीं, तर चिनी लोकांना चुंबनविधि नरमांसभक्षकांचा राक्षसी प्रकार वाटतो.
महाराष्ट्रातील सुविध समाजांत मामेबहिणीशी लग्न करायला हरकत वाटत नाहीं, तर दक्षिणी लोकांतला हा ‘अनाचार’ पाहून हिंदुस्थानातल्या इतर प्रांतीय लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. उत्तर हिंदुस्थान, बंगाल, माळव्याकडे बायकांना पडद्यात डांबून ठेवणें हा नीतिचा कळस वाटतो मग दृष्टीआड एखादी निराळीच सृष्टी निर्माण झाली तरी त्याची त्यांना खंत नसते! तर द्रविडी लोकांत स्तनाच्छादनाची काडीमात्र व्यवस्था न ठेवता बायकाना खुशाल पुरुषांमध्ये मिसळू देतात, पण महाराष्ट्रातील बायकांची चोळी त्यांचा रमणीयपणा वाढवून, त्यांची लाज राखिते, नर्मदेच्या उत्तरेस बायकांना तिळमात्र स्वातंत्र्य नसते. द्रविड देशांत व विशेषतः मलबारांत बायकांस फाजील मोकळीक असते, त्यामुळे त्या बऱ्याच निर्लज्ज होतात. प्रयागास द्रविडांच्या बायका आपल्या डोक्यावरचे सर्व केस नदीस अर्पण करतात, व काही दिवस
सधवा असतांहि विधवा दिसतात.
महाराष्ट्रातील बायका फक्त तीनच बोटें वेणी देतात. बंगाल्यांत कित्येक बाह्मण भाराभर बायका करतात. व कित्येक बायकांच्या घरी नवरा आला म्हणजे आईबाप हा तुझा नवरा म्हणून सांगतील तेव्हा बायकोची ओळख पटते ! द्रविडांमध्ये तर कित्येक ठिकाणी एकाच वेळी अनेक नवरे करण्याची चाल आहे. " (कै. भागवत उम्दार पृ. १४४) यावरून आपल्याला असें दिसतें कीं, "आचारः परमो धर्मः " आचार हाच जर परम धर्म मानला, तर धर्माचेहि निश्चित स्वरूप ठरविणें फार कठिण आहे. जेथे आचाराची मूलतत्त्वेंच निरनिराळ्या ठिकाणी भिन्न भिन्न ठरलेली आहेत, तेथे नीतिमत्तेची निश्चित रूपरेषा आखण्याचा यज्ञ म्हणजे अनवस्था प्रसंगच नव्हे काय? मैथुनविवेक मैथुनातिक्रम आणि व्यभिचार यांच्याहि व्याख्या देशपरत्वें व आमच्या हिंदुस्थानांत प्रांतपरत्वें निरनिराळ्या मानलेल्या आहेत. अर्थात नीतिमत्तेव्या कल्पनेची एकवाक्यता करण्याचे काम अत्यंत कठीण होऊन बसले आहे हे निराळे सांगणे नको. तथापि देशपरत्वें किंवा प्रांतपरत्वे नीतीच्या निश्चित मर्यादेबाहेर जनतेच्या वर्तनाची उडी पडलीच आणि त्या देशाच्या किंवा प्रांताच्या दृष्टीनें जनता मैथुनातिक्रमांत बेसुमार भरकटली, तर त्यामुळे त्या देशाचा अगर राष्ट्राचा ऱ्हास होणें शक्य आहे काय ?
मैथुनातिक्रम आणि राष्ट्राचा हास
यांचा काही अन्योन्य संबंध आहे काय ? या प्रश्नांचा प्राश्चिमात्य शास्त्रज्ञांनी करसून विचार केला आहे व त्यावर सोपपत्तिक विवेचनाचे अनेक ग्रंथहि लिहिले आहेत. त्यांपैकी Car Bleibtren यांच्या Paradoxes of the Conventional Lies नामक ग्रंथातील एक महत्त्वाचा उतारा खालील देऊन. या मुद्याची आपण सांगता करू
"Ancient Rome produced its greatest men during a period of moral degeneration. The finest blossoms of Helenic civilization coincided with a period of fundamental immorality. We might easily urge that after Pericles, Phidias, Aristophanes, Euripides, Alcibiadia, and Socrates, the decay of the Greek race began, notwithstanding the fact that much later in Greek history the vital force of the nation was proved by the appearance of men of the first rank, such as Alexander, Aristotle and Demosthenes. But this rejoinder does not help us much, for in the earlier days of Greek history, in the legal Codes of Solon and Lycurgus, we find the most notable and clear indications that precisely in respect of sexual relationship, and more especially in regard to marriage and the procreation of children, the morals of this fresh and youthful race were disordered to the greatest possible extent.
"Just the same do we find it at the time of the Italian renascence and at the time of the Ho. henstaufen dynasty-a complete confusion of sexual relationships, The eighteenth century, also, notwithstand. ing all the justified jeremiads of Rousseau regarding the widespread unnaturalness of the time, and notwithstanding all the sorrows of the young Werther, was distinguished by the production of an incredible abundance of men of genius; and in contemporary France, the country which was most severely affected by this moral decay, there flourished the generation to which such men as Mirabeau and Nepoleon belonged-men whose unparalleled vitality influences us to this moment."
The Sexual Life of our Time. P. 460.)
जी गोष्ट इतर राष्ट्रांची तीच हिंदुस्थानाची. हिंदुस्थानांत देवमाणसे राहतात आणि इतर राष्ट्रात राक्षस राहतात, असे थोडेच आहे? मनुष्यप्राणी आणि मनुष्यस्वभाव हा येथून तेथून सारखाच फरक जर काही असेल तो एवढाच की हिंदुस्थानांत स्वतः कांहीही हातपाय न हालविता वडिलांचे गुण गाणाऱ्या पढतमूर्खाची इतर देशापेक्षा अधिक लोकसंख्या आहे. हिंदुस्थानात ज्या ज्या वेळी काही विशेष राष्ट्रीय चळवळ घडून आलेली आहे, त्या त्या वेळचा इतिहास उघटून पहा म्हणजे जीर्णमतवाद्यांनी व त्यांच्या बगलबच्यांनी अनीतीचा, मैथुनातिक्रमाचा आणि संकराचा शंख जोरजोराने फुंकल्याचेच आपल्याला आढळून येईल चोराच्या उलट्या बोंबा कशा असतात हे जसें अलीकडे महाराष्ट्रातील बऱ्याच योगभ्रष्ट दे. भ. च्या वर्तनावरून शिकण्यासारखे आहे. तसेच प्रत्येक नवविचाराच्या उष:काली जीर्णमताचा शंखाध्वनी किती जोरजोराने सुरु असतो ते प्राचीन इतिहासावरूनहि समजून येण्यासारखे आहे. पांडवाच्या वेळी धर्माच्या राजसूय यज्ञप्रसंगी श्रीगोपालकृष्णाची निर्भत्सना करणारा शिशुपाल, अगदी अलीकडे श्रीशिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकोत्सवाला विरोध करणारे मोरोपंत पिंगळ्याच्या उपरण्याखालचे ब्राह्मण व सांप्रत कुळकर्णी वतनाच्या
मेल्या मढ्याचा नाटकी आक्रोश.
करून, कोल्हापूरकर छत्रपतीच्या नांवाने कडकडा बोटे मोडणारे बेळगावच्या बेळवीसारखे भिक्षुकी नामदार हे सर्व प्राणी या जीर्णमतवादाचा शंखध्वनि करणारे आहेत, हे अधिक विशद करूनच सांगितले पाहिजे असे नाही. तथापि हा सारा त्यांचा धडपडाट म्हणजे तेल संपलेल्या दिव्याच्या ज्योतीचा अखेरचा फडफडाट असल्यामुळे, ज्ञानी जन त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत.
* * * *
प्रकरण ५
(२१) वरील विवेचनावरून वाचकांच्या पूर्ण लक्षांत आले असेलच की उन्नति व अवनति हा प्रश्न आत्मविषयक आहे आणि त्याच्या संबंध प्रत्येक व्यक्तीशी असतो, कुटुंबाशी नसतो. आजूबाजूची परिस्थिती ही प्रत्येक व्यक्तीच्या अवनतीला किंवा उन्नतीला पुष्कळ अंशी कारण होत असली, तरी तिचा बरा वाईट परिणाम होणें हें प्रत्येक व्यक्तीच्या आत्मिक परिणतीवरच (Psychic development) विशेष अवलंबून असतें हे तत्व विसरता कामा नये. गुलाब पुष्पांचे रोप चांगल्या ठिकाणी लावलें, त्याची नीट मशागत ठेवली, वेळच्यावेळी पाणी दिलें, तर त्याला सुंदर व दळदार गुलाबाची फुले येतात, तेच दुर्दैवाने एकाद्या डोंगरकपाटी खडकाळ दरींत यच्छेनें उगवले तर त्याला फुले येणार नाहींत असें नाहीं, पण तीं खुरटलेली, फिकट व अल्पायुषी अशीच येतील. या फुलांना आपण गुलाबाची फुलें असे म्हणू खरें, परंतु टवटवीतपणा, रंगाची खुमारी, पांकळ्याचा दणकटपणा आणि सुवासाची चित्तोन्माद माधुरी इत्यादि उत्कृष्ट गुलाबाच्या फुलांचे गुणधर्म मात्र त्यांत आढळत नाहींत, म्हणून रसिकांचीहि दृष्टी आपल्याकडे वेधून घेण्याचे सामर्थ्य त्यांत उरत नाही. ते नुसतें नामधारी गुलाब पुष्प असतें. परिस्थितीचा एवढा परिणाम होत असतो. उत्तम परिस्थितीत धोत्र्याचे किंवा कांटेसराट्याचेंहि झाड बेसुमार थरारते; पण त्याला गुलाबाच्या किंवा मोगऱ्याच्या कळ्यांचा भर कधि येत नाही, याच नियमानुसार, ज्याची वैयक्तिक आत्मपरिणति चाण्डालवृत्तीपर्यंतच आलेली आहे. असा एखादा प्राणी कर्मधर्मसंयोगाने गंधभस्मांचे आडवे उभे पट्टे ओढणाऱ्या ब्राह्मणबुवाच्या कुटुंबात जन्माला आला तर तेथल्या
दशदिशा मोकाट परिस्थितीचा फायदा.
घेऊन तो आपल्या चाण्डाळ वृत्तीची रंग गाजवून घेतल्याशिवाय कधीहि राहणार नाही. पुण्याच्या चित्पावन पेशवाईच्या अंमदानीत असली उदाहरणे शेंकड्यांनी दाखविता येतील. फार या पण “अन्यधनहरणनिच्छाया कारणोपेक्षायां शुद्रेती संबोधनम्” (जो परक्याचे धन हरण करतो तो शूद्र )या सूत्रानुसार छत्रपतींचे सर्वस्व गिळंकृत करणारे
श्रीमंत पेशवे शूद्ध ठरतात.
अनुवंशिक संस्काराचा अर्थ वास्तविक कौटुंबिक परंपरेने चालत आलेले संस्कार असा नसून, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मश्रेणीबरोबर उत्क्रांत होत आलेले त्याचे स्वतःचे संस्कार असाच आहे. नाहीतर पळीपंचपात्री खडबडविण्यांतच ज्याचा आणि ज्याच्या घराण्याचा सारा जन्म गेला, या विश्वनाथ भटजीचा मुलगा बाळाजी अवचित शकुनीमामांचे पॉलिटिक्स गाजवून पेशवाई सर करण्यास समर्थ कसा झाला, हे कोडे उलगडणे कठीण जाते. त्याच शुद्ध युक्तिबाज बाळाजीचा मुलगा बाजीराव तर
मूर्तिमंत क्षात्रतेजाचा नमुना
निर्माण झाला, तेव्हां त्याच्या ब्राह्मण-संस्काराची वासलाद कशीकाय लावायची? अटकेला झेंडे फडकवणारा आणि अहमदशहा अबदलीचे नरडे फोडून त्यांचे रक्त घटघटा पिणारा भीमकर्मा राघोबा ब्राह्मण होता, असे कोण म्हणेल? परंतु त्याचाच वीयोत्पन्न मुलगा रावबाजी ब्राह्मणकर्मात अत्यंत तरबेज होता, म्हणून इंग्रज इतिहासकारांनी त्याची मोठी स्तुति केली आहे. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातील सावित्रीबाई ठाणेदारीण आणि कऱ्हाडे समाजातील
झांशीची राणी लक्ष्मीबाई
या शंबर नंबरी क्षत्रिय नव्हत्या असे म्हणणारा शहाणा शहाणाच म्हटला पाहिजे. अर्थात् अनुवंशिक संस्कार म्हणजे प्रत्येक कुटुंबाच्या परंपरेने चालत आलेले संस्कार नसून जन्माला येणाऱ्या प्रत्येक प्राण्याचे वैयक्तिक कृतकर्माप्रमाणें बनत आलेले आत्म्यावरील संस्कार, असा अर्थ ठरविल्याशिवाय बापाच्या आणि लेकाच्या स्वभावप्रवृत्तीतील विषमता किंवा स्मृतिकरांनी ठरविलेल्या विशिष्ट समाजाच्या गुणकर्माच्या व्याख्या आणि त्या समाजात जन्माला आलेल्या प्रात्यांची विरोधी वर्तणूक याची विवेकबुद्धीला पटेल अशी एकवाक्यता करता येणें शक्यच नाही.
जोपर्यंत गुणकर्मावरूनच जात ठरविण्याचा प्रघात हिंदुसमाजात रूढ होता तोपर्यंत ही विषमता व हा विरोध सामाजिक उन्नतीच्या आड केव्हांहि आला नाहीं आणि सांप्रत निरनिराळ्या समाजांत जो एक प्रकारचा असंतोष ऊर्फ परिस्थितीविषयी गुप्त संताप प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी दिसून येतो. त्याचाहि मागमूस नव्हता. अनुवंशिक संस्काराचा विचार करतांनाच अमका प्राणी अमक्याच ठिकाणी जन्माला कां येतो. जन्म आणि जन्मांचे क्षेत्र यांत कांहीं गूढ परंतु निश्चित असें आकर्षक तत्व काय आहे की काय, हे प्रश्न पुढे येतात. आध्यात्मशास्त्रवेत्ते या आकर्षणाच्या अस्तित्वाची ग्वाही देतात. समान प्रवृत्तीशिवाय आकर्षण होऊ शकत नाही आणि अध्यात्मशास्त्रवेत्ते म्हणतात की प्रत्येक प्राणी आपल्या गुणधर्मानुसार अनुकूल अशा जननक्षेत्राची यद्दच्छेने निवड करीत असतो. म्हणजे याचा सरळ अर्थ असाच घेणे प्राप्त आहे की मातेच्या व पुत्राच्या गुणकर्मप्रवृतींत बरेचसे साम्य असले पाहिजे, परंतु हा नुसत्या व्याखेचा प्रदेश सोडून प्रत्यक्ष जगांत आपण पाहू लागलों की याहि नियमाच्या ठोकळ्यात जबरदस्त विसंगतपणा दिसू लागतो इतका की जितका अधिकाधिक विचार करावा तितका तो त्या आकर्षणतत्त्वाचे सर्व स्वारस्यच आकर्षण करू लागतो.
अत्यंत सुष्ट व ज्ञानी आईबापांच्यापोटी अत्यंत दुष्ट रानवट वृतींची कारटी जन्माला आलेली कोणी पाहिली नाहींत? अथवा, चांडाळ वृत्तीच्या आईबापांच्या पोटी सर्व जगाला वंद्य असे सत्पुरूष जन्मल्याच उदाहरणें काय कमी दाखविता येतील? या ठिकाणी या आकर्षण तत्वाची मांडणी कशी काय करावयाची हा मोठा बिकट प्रश्न येऊन पडतो; अखेर अध्यात्मवेत्ते अगम्यपणाच्या, गुढत्वाच्या किंवा अपरोक्षतेच्या काही ठराविक साच्यांतील सूत्रांच्या आधाराने त्याची कशीबशी काहीतरी वासलाद लावतात. परंतु त्यामुळे जिज्ञासूचें शांतवन होऊ शकत नाही. सुष्ट मातेच्या उदरी जर दुष्ट पुत्र अथवा कन्या जन्माला येणें अशक्य नाहीं. किंवा दक्षिणोत्तर ध्रुवाइतक्या विषमतेची तीव्रता जर आईबाप व त्यांची मुलें यांत शेंकडों नव्वद प्रसंगी दृष्टीस पडते, तर
ब्राह्मणाचा पुत्र ब्राह्मणच निपजतो
या घाशीरामी स्मृतिवचनांत काय अर्थ राहिला? उलटपक्षी शुद्ध वर्तनाच्या ब्राह्मणाच्या उदरी एखादा नतद्रष्ट चांडाळ प्राणी पुत्ररूपाने अवतरला, तर त्या ब्राह्मण बापाच्या घरांतील परिस्थिती त्याच्या चांडाळ वृत्तीला पोषक नसल्यामुळे, तिचे तट फोडण्याचा यत्न तो करीत असतांना. आपल्या चांडाळपणाची धूळ आईबापांच्या डोक्यात फेकून, ते ब्राह्मणांचे घर चांडाळाची दरी बनविल्याशिवाय रहात नाहीं. त्याच प्रमाणें शूद्रत्वाच्यापुढें ज्यांची उत्क्रांतीच झालेली नाही. अशा आईबापांच्या पोटी जन्माला आलेल्या पूर्ण उत्क्रांत अशा ज्ञानी जीवालाहि आपल्या आजुबाजूच्या परिस्थितीशी व प्रत्यक्ष जन्मदात्या आईबापांच्या विषम मनोवृत्तीशी अत्यंत कठोरपणाचा झगडा करूनच आपल्या वैयक्तिक परिणतीला पोषक व उत्तेजक असे नवेंच परिस्थितीचें क्षेत्र निर्माण करावे लागते. हिंदुस्थानांत जातीभेदाची जी अत्यंत तीक्ष्ण असह्य स्थिति सांप्रत राष्ट्रीय ऐक्याला कस्सून विरोध करीत आहे, तिच्या अनेक पाळ्यामुळ्यांपैकी एक मुळी या जन्मप्राप्त विषमतेत आहे, हे लक्षांत घेतलें पाहिजे. हल्ली हिंदु समाजातील अगणित जातीजातीतल्या दरोबस्त व्यक्तीत जो एक प्रकारचा असंतोष, परिस्थितीविषय जळफळाट आणि परस्पर संबंधातसुद्धां एकमेकांविषयी सहानुभूतीचा अभाव दृष्टीस पडत आहे. सर्वांच्या जशी ही
जन्मप्राप्त विषमतेची शूर्पणखा
आहे. हेच विचारांती कबूल करावे लागते. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर पुढारलेले आणि मागासलेले, इत्यादि भेदभावांच्या आंगावर कसल्याहि इतर गोष्टींची वारुळे वाढलेली असोत, त्यांच्याहि पोटांत याच विषमतेचे जालीम विष रसरसत असते. ही मुद्याची गोष्ट विसरून चालणार नाही. दारूचे गुत्ते हमरस्त्यावरुन आड रस्त्यावर नेल्याने किंवा अज्जीबात बंद केल्याने दारूबाजीच्या व्यसनाचा नायनाट कधि होत नाही तर मनुष्य दारू का पितो या गोष्टीच्या आद्यकारणाचा छडा लावून त्या आद्यकरणाचेच उच्चाटन केले पाहिजे. त्याच प्रमाणे या जन्मप्राप्त विषमतेचें आद्यमूळ खच्ची केल्याशिवाय हिंदुस्थानातला जातिभेद व जातिद्वेष रतिमात्र कमी होणार नाहीं.
टिळकांच्या मॅनिफेस्टोंत जातीभेद
धुडकावून देण्यात आला आहे, असली नाटकी विधाने करुन जातीभेदाचे खंडन करणे म्हणजे हमरस्त्यावरील दारुचे पिठे आडरस्त्यांवर नेऊन मद्यपाननिषेधाची पुणेरी चळवळ करण्याइतकेंच खोडसाळ होय. असल्या गोष्टी मानण्या न मानण्याच्या टायलीखोर हस्तिदंती वर्तनानें सुधारण्यासारख्या नसतात, हे आमच्या या मॅनिफेस्टोवाल्यांना अझूनहि उमगत नाही, येथेच त्यांच्या भिक्षुकी हेतूचा तंतू दडी मारून बसलेला आहे.
* * * *
(२२) आपण मार्गे पाहिले की मनुष्याच्या आत्मविकासाला त्याच्या आजूबाजूची परिस्थिति बऱ्याच अंशी कारणीभूत होत असते. परंतु वरील दोन उदाहरणावरून आपल्याला असा निश्चित निष्कर्ष काढता येतो की परिस्थितीचा बरा वाईट परिणाम होणें हें देखिल प्रत्येक व्यक्तीच्या ग्रहणक्षमतेच्या तीव्र सौम्य प्रमाणांवर विशेष अवलंबून असतें. मुलाची तामसवृत्ति जर आईबापांच्या सात्विक वृत्तीपेक्षा अधिक उन्मत्त असेल, तर सात्विकपणाला अखेर तामसीपणाच्या वर्चस्वापुढे हतबल व्हावें लागेल आणि सात्विकपणाचा जोर विशेष असला तर पिढ्यानपिढ्या तमोवृत्तीत खितपत पडलेले समाजाच्या समाज केवळ एका व्यक्तीच्या सात्विक पराक्रमाने उन्नत होऊ शकतात.
सोळा संस्काराची योजना
म्हणजे एका ठरावीक स्वरुपाच्या परिस्थितीचा मनुष्यावर आरोप करुन त्याच्या नैसर्गिक गुणकर्माला विशिष्ट वळण देण्याचा एक मानवी प्रयत्न अर्थात् हा निवळ प्रयत्नच आहे त्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर त्याच्या विवक्षित गुणकर्माच्या सौम्य तीव्र ग्रहणक्षमतेप्रमाणेच व्हायचा. ‘जन्मना जायते शूद्रः | संस्कारात् द्विज उच्यते’, संस्कारानें तो द्विज होतो किंवा झाला असे ‘उच्यते’ महणतात मानतात इतकेंच त्याला या मानवी खटाटोपीच्या संस्कारांनी द्विजत्व तें असें थोडें आहे? तूं या अमूक संस्कारामुळे द्विज झालास तू आतांपासून ब्राह्मण झालास, किंवा तूं क्षत्रिय आहेस, असा नुसता शाब्दिक आरोप त्यावर करून त्याची त्याबद्दलची भावना दृढ करण्याचा तो यत्न आहे. हा यत्न सर्वच व्यक्तींत सारख्या प्रमाणांत फलद्रुप होतोच असे नाही, कित्येकांत तर तो मुळींच होत नाहीं.
म. भा. शांतिपर्व अ. १११ मध्ये व्याघ्र आणि गोमायु यांच्या संवादात गोमायूने व्याघ्राला में उत्तर दिल्याचें कल्पित केलें आहे, तेंच या ठिकाणी अनुभवास येते. गोमायू म्हणतो माझे जन्म में कांही कुल ठरविण्याविषयी प्रमाणभूत नाही. कारण, कुल हे प्रत्येकाच्या आचरणावरून ठरविलें जातें.. स्वभावाच्याच योगानें धर्मरूपीं क्रिया उत्पन्न होत असते; आश्रम हा काही धर्मास कारणभूत नाहीं. म्हणून द्विज म्हणविणान्या व्यक्तींवर प्रताप्रमाणे जरी उपनयनादि षोडश संस्कारांचा मामुली वहिवाटीचा आरोप करण्यात येत असतो, तरी त्यांतल्या सगळ्याच व्यक्ति ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, कर्मप्रविण किंवा कर्मक्षम बनतातच असा कांहीं नियम नाही. जी गोष्ट सोळा संस्काराची तीच अवस्था चार आश्रमांची हे सारे बाह्य उपचार आहेत. मनुष्याच्या बाह्यांगावर शिंपडले जाणारे हे रंग आहेत. या कृत्रिम रंगांच्या शिडकावानें बाह्यात्कारी जरी एखादा मनुष्य ब्राह्मण किंवा क्षत्रिय दिसत असला, तरी अंतरंगी तो ब्राह्मण किंवा क्षत्रिय असेलच असा कांहीं निश्चित भरंवसा देता येणार नाहीं जसे नाटकी
गण्या वाढप्या हरिश्चंद्र राजा होतो
तेव्हां त्याच्यावर नाट्यप्रयोगापुरती आरोप करण्यांत आलेली ती भूमिका यथातथ्य वठविण्याकरितां तो स्वप्नातील वचनसुद्धां खरें करून विश्वामित्राच्या स्वाधीन सर्व राज्य अर्पण करतो आणि आपण स्वतः सकुटुंब गुलामगिरीचा पेशाहि स्विकारतो. परंतु भरतवाक्य होऊन ‘टिकिटाचे पैशे संपले, आतां थिएटरची भाडोत्री जागा खाली करा’ हे जाहीर करणारी शेवटली घंटा ठणाणतांच धाडकन् खाली कोसळून पडणाऱ्या ड्रॉप पडद्याबरोबरच आमच्या गणोबांचा राजेपणाहि खोबरेलमिश्रित साबणाच्या फेंसांत सफाई धुतला जाऊन ते पुनश्च आपल्या वाढपेपणाच्या कर्मप्राप्त झारापळीचे मालक बनतात. तात्पुरता राजेपणाचा आरोप आणि तात्पुरतीच राजेपणाची ऐट संस्काराच्या आरोपाचा शेवटला पडदा पडतोच पुन्हा आपला
गण्या वाढप्या तो गण्या वाढप्या.
राजेपणाच्या तात्पुरत्या आरोपाच्या अगणित आवृत्त्यांच्या संस्कारामुळे सुद्धा त्याच्या गुणकर्मसिद्ध वाढपेपणांत राजवृत्तीचा भारदस्तपणा रतिमात्र दृग्गोचर होत नाहीं. जात्याच विलासी व छंगीफंगी असणारा नट मात्र कृष्णाची भूमिका वठवितांना रुक्मिणींच्या रंगमहालांत "नच सुंदरी करूं कोपा च्या प्रवेशांत आपल्या विलासी मनोवृत्तीच्या निसर्गजात प्रत्यक्ष प्रदर्शनाच्या रंगाने साऱ्या प्रेक्षकांना कसा दंग करून सोडतो, हे थिएटर वारकऱ्यांना अधिक खुलाशाने सांगणे नको. नाटकांतील भूमिका आणि सोळा संस्कारांचे आरोप हीं दोन्हीहि सारखीच मात्र सोळा संस्कारांची घटना ही जरी बरीच अर्वाचीन असली, तरी तींतहि तिच्या उत्पादकाचा हेतू मात्र अत्यंत शुद्ध, उदात्त आणि व्यापक होता हैं मात्र आपल्याला प्रांजळपणें कबूल केले पाहिजे.
अलीकडे हिप्नॉटिझम् मेस्मेरिझम् इत्यादि सजेस्टिव थिरॅप्युटिक्सचे (म्हणजे मनुष्याला कांहीं विशिष्ट प्रकारच्या मोहनीनें आपल्या इच्छाशक्तीच्या काबूत आणल्यावर त्याला काही सूचना करून करून त्याच्या मनोधर्मांच्या सहायाने नाना प्रकारचे शारिरीक किंवा मानसिक रोग बरे करण्याची शास्त्रसंमत विद्या) जे प्रकार आपण पहातो, तोच प्रयत्न या सोळा संस्कारांच्या विधींत आहे. स्वभावतःच ज्यांचे गुणधर्म ब्राह्मण, क्षत्रिय अथवा वैश्य प्रवृत्तीचे नसतील, त्यांच्याहि मनांवर या विधींचा परिणाम होऊन त्यांची वृत्ति, क्रमशः का होईना, परंतु "मी ब्राह्मण आहें, मी क्षत्रिय आहे, माझें अमुक अमुक कर्तव्य आहे. समाजांतील अमुक एका विशेष कामगिरीकरितां माझा जन्म आहे. इत्यादि कल्पनांनी पूर्ण भारून जाऊन से उन्नत होण्याचा विशेष संभव आहे. हीच उदात्त कल्पना सोळा संस्कारांच्या उत्पादकाला विशेष मानवली, यांत संशय नाहीं, मंत्रतंत्र औषधोपचार इत्यादि प्रकार मानवी असले तरी त्यांचा मूळ उद्देश निसर्ग प्रवृत्तीला विरोध करण्याचा नसून (कारण निसर्गाला विरोध करण्याची कोणाची छातीच नाही.) तिच्या हालचालींना उद्दीपित करण्याचाच असतो. जठराग्नी मंद झालेल्या रोग्याला हिप्नॉटिस्ट डॉक्टर तुझा जठराग्नी मुळींच मंद नाहीं, तुला सपाटून भूक लागते, तुझी पचनशक्ति उत्तम आहे. वगैरे सूचना करून करूनच निवळ आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्याला कालवशात् पूर्ण निरोगी करून सोडतो, हे आपण प्रत्यही पाहतो. त्याचप्रमाणे गुणकर्माची मंद असलेली निसर्ग प्रवृत्ति तीव्र करून तिला प्रगमनशील बनविण्याची स्तुत्य कामगिरी हे सोळा संस्कार करीत असतात. परंतु याहि कामगिरीत कालवशात्
द्वैत-पिशाच्चाचा प्रवेश
झाला. अधिकारी आणि अनधिकारी हा भेद माजविणाऱ्या क्षुद्र वृत्तीच्या भिक्षुकी स्मृतिकारांचा परशुरामी डोळा अखेर सोळा संस्कारांच्या क्षेत्रावरहि येऊन पडला. त्यांना सोळा संस्कारातसुद्धा जातिभेद आणि संकर दिसू लागला. कोकणस्थ आणि देशस्थ भेदाप्रमाणेच या संस्कारातसुद्धां त्यांनी अमंत्रक आणि समंत्रक असे दोन भेद पाडून, कोणाला किती संस्कार करू द्यायचे याचीहि त्यांनी
चार एके चार, चार दुणें आठ
अशी चाराच्या पाढ्यावर विभागणी ठरविली. सोळा संस्कार ते काय आणि त्याची विभागणी ती काय! पण एकदा स्वार्थाचा पगडा पडल्यावर मनुष्य किती नीचपणाचें क्षुल्लक कृत्यसुद्धा करण्यास प्रवृत्त होतो, याचें हे एक ठळक उदाहरण आहे. स्मृतिकार झाले काय, शास्त्रकार भाष्यकार झाले काय किंवा मनु याज्ञवल्क्याच्या श्लोकांवर पुणेरी मल्लीनाथ्या झोडणारे आचार्यकार काय
सगळे एकाच माळेचे मणी !
ब्राह्मणांचे वर्चस्व एनकेनप्रकारेण वाढवायचेंच, एवढ्या संकल्पाचा गंडादोरा मनगटावर चढवितांच ज्या शहाण्यांनी भागवतासारखी प्रचंड कादंबरी प्रसवून भगवान् श्रीकृष्णाला अट्टल छिनाल बनवायला सोडलें नाहीं, ज्यांनी महाभारत ग्रंथातील प्रत्येक नायक नायिकेला ब्राह्मणांच्या पायांतल्या वहाणांच्या किंमतीनें रेखाटण्यास कमी केलें नाहीं आणि ज्यांनी मनुस्मृतीतील ब्राह्मण-स्मृतिपाठाची स्तोत्रं पितामह भीष्माला घरघराट लागला असता त्याच्या घशांत कोंबायला पाठीमागे पुढे पाहिलें नाही. त्यांनी सोळा संस्कारासारख्या शुल्लक विषयाची छाटाछाट आणि तोडातोड केली, तर त्यांत आश्चर्य मानण्याचे काय कारण? बरें, अधिकारी आणि अनधिकारी या भेदाला तरी कांहीं आधार? आधार हाच की आमची भिक्षुकशाहीची इच्छा ! दुसरा काही नाही. सोळा संस्काराचे सोळा आणे अधिकारी ते ब्राह्मण, अनधिकारी ते ब्राह्मणेतर ! म्हणजे सारा पात्रापात्रतेचा सोहळा
आई सवाशीण बाप गण
या पंढरपुरी सोहळ्याप्रमाणेच समजायचा !! शिवाय येथे अशीहि शंका उत्पन्न होते की ब्राह्मण हा जात्याच ‘धर्मार्थमुप्तन्नो’ (धर्माकरितांच उत्पन्न झालेला आहे). आणि तो ब्रह्मभूयाय कल्पते (मनु. १-९८) आत्मज्ञानाच्या द्वारा मोक्षास समर्थ होतो, तर त्याला हा भवसागर तरून जाण्यासाठी सोळा संस्काराचा हा पोकळ भोपळा कमरेला बांधून घेण्याची अवश्यकताच का भासावी? परंतु हा प्रश्न उत्पन्न करण्यांत कांही अर्थ नाही. कारण ज्यांनी आडव्या उभ्या गंधाकरितां आणि जानव्याच्या ब्रह्मगांठीच्या जाडीरुंदीकरितां मोठमोठाली रणें माजविलीं, त्यांनी सोळा संस्काराचा भोपळा स्वतःच्या गळ्यांत कायमचा अडकवून घेण्याचा पोरकट हट्ट घेतला, तर त्यांत विशेष तें काय? या भोंपळ्याच्या जोडीनेंच
वेदोक्त पुराणोक्त वादाचें मडकें
हा एक भिक्षुकशाहीच्या ब्राह्मण्यसिद्धीचा विषय गेली तीनशे वर्षे महाराष्ट्रांत धुमाकूळ घालीत असून, या रिकाम्या मडक्याच्या निर्मळ स्वराज्यासाठी ब्राह्मणबुवांनी मराठी स्वराज्याच्या टोलेजंग इमारतीची राखरांगोळी करायलाहि कमी केलें नाहीं. वास्तविक विचार केला तर हा वाद दिसतो तितका भरीव नाहीं.
भिक्षुकशाहीच्या पोकळ अभिमानाइतकाच पोकळपणा त्यांत आहे. या वादावरून आम्हांला एका कल्पित गोष्टीची आठवण होते. एका निपुत्रिक श्रीमंत म्हातारीच्या घरावर एक रात्री चोरांनी दरोडा घातला. दरोड्याची चाहूल लागतांच त्या धूर्त म्हातारीने आपल्या जवळचे सारे दागदागिने व जडजवाहीर घाणेरड्या गोणपाटांत भरून ती शेजारच्या उकीरडयावर फेंकून दिली आणि घरांतल्या बिजागरी पेट्यांत फाटके जोडे व वहाणा दडपून भरून ठेवून त्यांवर मोठी कुलपे ठोकली. दरोडखोर येतांच ती मोठ्या गयावया करून रडू लागली व म्हणाली "बाबांनो, उगाच मारहाण करूं नका. हे माझे देव्हाऱ्यांतले चांदी सोन्याचे सारे देव तुम्ही खुशाल घेऊन जा. पण कृपा करून या माझ्या पेट्यांना मात्र हात लावू नका. वाटेल तर तुम्ही माझा जीव घ्या, पण या माझ्या पेट्या मात्र नेऊ नका" चोरांनी ताडलें कीं जें कांही वेदोक्त परब्रह्म आहे ते या पेटाऱ्यातच आहे. त्यांनी म्हातारीला खांबांशी बांधून तिच्या धडपडीकडे काडीमात्र लक्ष न देता त्या पेट्या भराभर लांबविल्या, दुसऱ्या दिवशीं लुटीची वाटणी करायला ते बसले तेव्हां पेटारे फोडून आंत पहातात तों काय ?
सगळ्या फाटक्या वहाणा व जोडे !
म्हातारीच्या कांगावखोर आरड्याओरड्याचे रहस्य त्यांना पूर्ण उमगल्यामुळे त्यांच्या चर्येवरील विकारांचे हुबेहूब चलचित्र घ्यायला त्यावेळी सिनेमाटोग्राफचा शोध लागलेला नव्हता. वेदोक्त आणि पुराणोक्त्ताचा तंटा हा जवळजवळ याच मासल्याचा आहे. ब्राह्मणबुवांनी म्हटले की `हो ! तुम्हाला वेदोक्ताचा अधिकार नाही. का क्षत्रिय मंडळीनी खडाखड दंड थोपटून म्हणायचे की “कसा नाही आम्हाला वेदोक्ताचा अधिकार रे भटा ? बस्स, आम्ही वेदोक्तच करणार!” म्हातारीने म्हटले, पेटाऱ्यांना हात लाऊ नका आणि चोरांनी तर्क केलाच की जर कांहीं विशेष असेल तर ते या पेटाऱ्यांतच आहे. यांतलाच नव्हे का हा सारा प्रकार? वेदोक्त करू नका म्हणणाऱ्या ब्राह्मणांना काय किंवा आम्ही वेदोक्तच करणार म्हणणाऱ्या ब्राह्मणेतरांना काय, वेद म्हणजे काय, त्यात काय सांगितलें आहे, त्यांतील ऋचा किंवा मंत्रांत विशेष काय आहे, याची थोडीफार माहिती असेल तर हराम ! अहो, हेंच काय, पण
वेद हे हिन्दूचे पवित्र ग्रंथ
आहेत, असे मोठ्या आवेशाने प्रतिपादन करणाऱ्या प्लॅटफार्म वारकऱ्यांनी आणि कलमकसायांनी वेदाचा एकतरी ग्रंथ एकदातरी नुसत्या डोळ्यांच्या उघडझांपीने चाळलेला असतो काय? वाडवडील बोलत आले. हे बोलतात एवढेच, वेदोक्त आणि पुराणोक्त तंट्यात शुद्ध अधिकाराच्या प्रश्नाशिवाय दुसरा कोणताहि महत्वाचा मुद्दा नाहीं. तुम्ही म्हणतां नको, आम्ही करणार, या हमरीतुमरीपलीकडे या वादांत विशेष असे आणखी कांही नाही. वेदांत काय वाटेल ते असले, तरी एक गोष्ट निर्विवाद आहे की वेद हे काही ब्राह्मणांच्या बापांनी निर्माण केलेले नाहीत; ते आब्राह्मणचांडाळांच्याच बापांनी लिहून ठेवलेले आहेत. त्यावर सर्वांचा हक्क सारखाच, वाडवडिलाच्या इष्टेटीवरचा वहिवाटदार जर उद्या यजमानालाच म्हणू लागेल कीं या इष्टेटीवर तुमचा काही अधिकार नाही, गेली अमूक हजार वर्षे माझें घराणें याची वहिवाट पहात आहे, तर कोणता यजमान त्या वहिवाटदाराची प्रथम बत्तिशी उतरून नंतर त्याला कोर्टात खेचणार नाही? परंतु पुणेकरांच्या अत्यंत आवडीचा हा
पुणेरी भांडकुदळ झोन
सोडून आपण किंचित् तात्विक दृष्ट्या या प्रश्नाची चर्चा करूं या. वेदप्रणित काय किंवा पुराण कुराणप्रणित काय, कोणच्या ग्रंथातल्या ऋचांनी अगर मंत्र्यांनी आपल्याला ईश्वराची प्रार्थना करण्यापलिकडे तर अधिक कांही करावयाचे नसते ना? बरें, असा काही सिद्धांत कोणी सांगत नाही किंवा कोठें नमूद असल्याचे आम्हांला आढळलें नाहीं कीं वेदोक्त मंत्रांनी प्रार्थना करणाऱ्या प्राण्याचें विमान पुराणोक्त प्रार्थना करणाऱ्याच्या खटाऱ्याच्या आधी जाऊन सायुज्यमुक्तीच्या वखारीत आदळतें! प्रार्थना किंवा पूजा अर्चा करायची तर ती तीन किंवा चार हजार वर्षांपूर्वीचे आमचे वाडवडील ज्या शब्दांनी ज्या लोकांनी ज्या स्वरांनी किंवा ज्या पद्धतीनी करीत असत, तेच शब्द तेच लोक तेच स्वर आणि त्याच पद्धतीनी आम्ही आतासुद्धा आमच्या प्रार्थना कराव्या, म्हणजे
बापाने सोडला म्हणून मुलानें सोडला
या म्हणीइतकाच ग्राम्य प्रकार नव्हे काय? वेदोक्त मंत्र्यांनी प्रार्थना केल्या किंवा काही धार्मिक आचार चालविले तरच ते ईश्वराला पोहचतात आणि इंग्रजीत किंवा एस्परॅन्टो भाषेत केल्यास ते क्षीरसागरात बुडून विरघळून जातात की काय?
किंवा वेदांच्या भाषेतल्या प्रार्थनाच काय त्या परमेश्वराला समजतात, इतर भाषांतल्या समजत नाहीत? असे असेल तर त्या अनाडी परमेश्वराची प्रार्थना करण्यात तरी काय अर्थ ? असल्या अनाडी देवाला, अनी बिझांटच्या मैत्रेय ऋषीप्रमाणे, प्रथम ऑक्सफर्ड किंवा केंब्रिजच्या पाठशाळेत पाठविला पाहिजे! याहिपेक्षां हास्यास्पद व कींव येण्यासारख्या प्रकार म्हणजे एकादशनी, सत्यनारायण, गणेशचतुर्थी इत्यादि प्रसंगी त्या त्या देवतांची पूजा वेदोक्त मंत्रांनींच करा असा यजमानाचा आग्रह आणि ‘हो हो मी नेहमी वेदोक्त मंत्रांनीच या व इतर पूजा करतो ही भटजीबुवांची हजरजबाबी पावती.’ पण या दोघांहि महामूर्खाना हें कळायला पाहिजे की वैदिक काळांत आणि त्याच्या पुढच्या अनेक शतकांत एकादशन्या, प्रायश्चिते, सत्यनारायण, द्वादशी प्रदोषांचे दोषी शिधे जन्माला आलेले नव्हते. इतकेच नव्हे तर गणपतीचाचसा काय पण
गणपतीच्या बापाचासुद्धां पत्ता
त्यावेळी त्या वेदकर्त्यांना लागलेला नव्हता. मग या अर्वाचीन देवतांच्या पूजा प्रार्थनांचे मंत्र वेदांसारख्या प्राचीन ग्रंथांत कोठून येणार? विशेष आश्चर्याची व खेदाची गोष्ट म्हटली म्हणजे ही वेदोक्त पुराणोक्ताची कोंबड्यांची झुंज लढविणारे कोण ? तर म्हणे आमचे जगद्गुरू (?) शंकराचार्य, या शंकराचार्यांचे एक मोठे पेवच फुटले आहे. आद्यशंकराचार्यांनी हिन्दुस्थानांत चार दिशेला चार मठ स्थापन केले असें म्हणतात; पण आजकाल एकेका मठांतून दोनदोन तीनतीन आचार्य फटाफट् बाहेर पडताना दिसत आहेत. हा कशाचा परिणाम? भिक्षुकशाहीच्या गुंडगिरीचा वाफारा या मठांत फाजील वाढल्यामुळे ही नवीन जगद्गुरूंची अंडी फुटत आहेत. की सोळा संस्कारांचा मामला जसा चाराच्या पाढ्यावर येऊन बितला तद्वत चार मठांचे चारचोक सोळा मठ उत्पन्न करण्याची या शंखाचार्यांना भिक्षुकी अवदसा आठवली आहे? मुण्डण केल्यावरसुद्धां शेंडीत राख घालून बाहेर निसटलेले करवीर पीठवरचे एक डुप्लिकेट आचार्य डॉ.कुर्तकोटी यांना अझून मठाकरितां जागाच सांपडत नाहीं. पुढेमागे मिळालीच तर हे भिक्षुकछंदानुवर्ति महाभागवत धर्माच्या बाबतीत काय दिग्विजय लावणार ते त्यांच्या आजपर्यंतच्या पाघळलेल्या अकलेवरून दिसतच आहे. या महाशयांची करवीरपीठाच्या गादीवर जेव्हां श्रीमच्छत्रपति शाहूमहाराज सरकार करवीर यांनी निवडणूक केली, तेव्हां या निवडणुकीची वाहवा करणाऱ्या तारापत्रांनी वर्तमानपत्रे कितीतरी ठणाणत होती व लोकहि म्हणू लागले होते की हे डॉक्टर साहेब आतां यापुढें हिदूंच्या जगद्गुरुच्या गादीचा काहीतरी मानमरातब वाढवून आपलें जगद्गुरू हें नांव सार्थ करतील ! या भविष्याची आतांपर्यंत काय वाट लागली त्याचा इतिहास महाराष्ट्रीयांच्या पुढे आहेच. अलीकडे या स्वामीनी राजकारणांत नांक खुपसण्याचा उपद्व्याप चालवून स्वतःच्या आत्मस्तोमाचे देव्हारे थाटविण्याची खटपट चालविली आहे. या स्वामींना नुसती लोकमान्यताच मिळवायची असेल व भिक्षुकशाहीच्या ग्लॉस्टरी छत्राखाली विख्यातीचा मोक्ष मिळवायचा असेल, तर त्यांनी आता आपल्या काषायवस्त्रादि बाह्य थाटाचा `वन्समोअर` संन्यास करून एक नवीन संगीत नाटक मंडळी काढावी, अशी त्यांना आमची सूचना आहे. मठाची उठाठेव करण्यापेक्षां किंवा हिन्दुधर्मपरिषदेचे वार्षिक लळीत नाचविण्याचा उपद्व्याप करण्यापेक्षा नाटक मण्डळीची योजना चुटकीसरशी (चुटकीसरशी म्हणण्याचे कारण सांप्रत कामधेनूप्रमाणे वाटेल तेव्हां झोली भरणारें नवीन फण्डयुग उद्यास आलें आहे व खेडाळू टारगट पोरांच्या पतंगवावड्या प्रमाणें निरनिराळ्या बँकेचे कोरेकरकरीत चेक इतस्मतः हवेंत वाटेल तितके भराऱ्या मारीत आहेत. दुनिया झुकती है, झुकानेवालेभी आस्तेकदम आ रहे है ! धर्मप्रसारांचे नियुक्त कार्य सोडून, नॉन्कोऑपरेशनच्या वाहत्या गंगेत सवंग लोकप्रियता मिळविणाऱ्या स्वामींना फण्डाचार्याच्या गादीवर बसवून त्यांच्यावर कोऱ्या चेकांचीं छत्रचामरें उडवायला फण्डगुण्डांचा सध्या दुष्काळ नाहीं.) यशस्वि होऊन डॉ. कुर्तकोटींचा बोलबाला हो हो म्हणत सर्वत्र गाजू लागेल डॉ. कुर्तकोटी हे स्वतः चांगले सुविद्य तत्वज्ञानी आहेत, त्यांचे खासगत विचार बुद्धिप्रधान (Rational) असल्याचे आम्ही प्रत्यक्ष परिचयानें सांगतो; पण दुदैवाने ते भिक्षुकशाहीच्या कचाट्यात सांपडल्यामुळे व निश्चित मतांचा पुरस्कार निधड्या छातीने करण्याइतका त्यांचा आत्मविश्वास त्यांच्या विद्वत्तेप्रमाणे कमाविलेला नसल्यामुळे, हा उमदा महाभागवत.
लोकमान्यतेच्या बाजारांत लिलावानें विकला
जात आहे, हे पाहून आम्हांला फार फार खेद होत आहे !! अचाट बुद्धिसामर्थ्याची व कर्तबगारीची असली नररत्ने भिक्षुकशाहीच्या मायावी डावपेंचाच्या जाळयांत सापडून गारगोटीप्रमाणे कवडीमोल ठरावी, यावरून हिन्दुधर्माचा व हिन्दुराष्ट्राचा भाग्योदय असून बराच लांब आहे. असे म्हणणे प्राप्त पडते डॉ. कुर्तकोटीबद्दल हे विचित् विषयांतर करण्याचे कारण विद्यमान डझन अर्धा डझन धर्मगुरूंच्या गादीवरील गुलालगोट्यांपेक्षा हे स्वामी अधिक विचारी व सुसंस्कृत आहेत आणि त्यांनी अझूनहि आपल्या भोवतालच्या परिस्थितीचा नीट विचार करून भिक्षुकशाहीची मोहक परंतु अंती घातक जाळी तोडून स्वतंत्र आचारविचाराच्या वातावरणांत येण्याचें मनावर घेतलें, तर त्यांच्या हातून हिन्दुधर्मांचें फारच मोठे अननुभूत कार्य होण्याचा फार मोठा संभव आहे. हा उपरतीचा प्रश्न आहे व स्वामींना उपरति होईल अशी आम्हांला उमेद आहे.
आजपर्यंत ही वेदोक्त पुराणोक्ताची झुंज झुंजविण्याचे कार्य भिक्षुकशाहीनें करावें व झुंज चिडीला आली म्हणजे या नामधारी जगद्गुरूंनी आज्ञापत्राचा एक नाटकी फार्स करून दोन्ही पक्षांना तात्पुरते चूप करावें, असा प्रकार गेली २०० वर्षे या महाराष्ट्रांत चाललेला आहे. ही आज्ञापत्रांची चिठोरी मिळविण्यासाठी ब्राह्मणेतर कित्येक समाज आपल्या
अलोट संपत्तीचें व इभ्रतीचें शेण
केल्याचे दाखले काल परवांपर्यंत भरपूर आढळतील. या समाजाचा ही असली कागदी चिठोरी मिळविण्यांतला उद्देश पाहिला म्हणजे त्यांचें स्वधर्माविषयींचे गाढ अज्ञान व मनाचा दुबळेपणा व्यक्त होतो. अमुक समाजाला वेदोक्ताचा अधिकार नाहीं किंवा आहे. सोळा संस्कारापैकी अमूक इतके संस्कार या समाजानें करावे, हैं ठरविण्याचा अधिकार या शंकराचार्यांना कोणी दिला? राजा किंवा धर्मगुरू हे जोपर्यंत आपल्या नियुक्त कर्तव्यकर्मापासून च्युत होत नाहीत, तोपर्यंतच जनतेनें त्यांच्या गादीचा मान राखून त्यांच्या आज्ञापत्रांना शिरसावंद्य मानावें, मग हे राजे व धर्मगुरू सनदशीर असोत वा नसोत. परंतु ज्या धर्मगुरुच्या गादीवर विद्याशुन्य ऐदी गणोबा आज शतकानुशतकें बसत आले आहेत व ज्यांनी आपले धर्मप्रसाराचे व धर्मोपदेशाचे कर्तव्यकर्मसुद्धा वर्ज केलें आहे अशा या नुसत्या निःसत्व दण्डधाऱ्यांची फाजील प्रतिष्ठा वाढविणें म्हणजे आपल्या दुबळ्या मनोवृत्तीचे प्रदर्शनच नव्हे काय? शिवाय हे जगद्गुरु म्हणजे कारस्थानी भिक्षुकशाहीच्या हातची मेणाची बाहुली असतात. वारा वाहील तशी शिडें पसरणारे व प्रसंग पाहून पगड्या फिरविणारे भिक्षुकशाहीचे शाहीर या मेणाच्या गोळयांना वाटेल तेव्हां
गणपति नाहीं तर माकड
बनवायला जर सोडीत नाहींत, तर असल्या या नामधारी पीठावरील पिठांच्या पुतळ्यांच्या आज्ञापत्रांना काय किंमत यायची ती ज्याची त्यानेंच ठरविलेली बरी! शंकराचार्यांसारख्या निःसत्व दण्डधारी कर्महीनांच्या सत्तेला वास्तवीक यापूर्वीच मूठमाती द्यायला पाहिजे होती. परंतु तेहतीस कोटी देव निर्माण करून दर माणसाच्या बोकांडी एकेक स्वतंत्र देव बसविणाऱ्या भिक्षुकशाहीची सत्ता जोपर्यंत हिंदुजन झुगारून देणार नाहीत तोपर्यंत ही पिठाची बाहुली आज्ञापत्रांचा सट्ट्याचा बाजार चालू ठेवणारच, सध्या स्वयंनिर्णयाचे युगांतर सुरू झालें आहे. सामाजिक व विशेषतः राजकीय बाबतीत
ज्याचा तो स्वतंत्र आहे
ही वर्तमान काळाची हांक ऐकून हिंदुजनांनी भिक्षुकशाही व धर्मगुरु या नादान धार्मिक अडत्यांच्या अडत्येगिरीला कायमची मूठमाती देऊन आपले पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य जाहीर करावें. अशी संधि वारंवार येत नसते. फार प्राचीन काळापासून धर्मप्रेमाची वेसण हिंदूच्या नाकात अडकलेली असून, ती भिक्षुकशाहीनें आपल्या हाती घट्ट धरून ठेवलेली आहे. उद्या राजकीय स्वातंत्र्य मिळाले तरी जोपर्यंत ही बौद्धिक गुलामगिरीची वेसण भिक्षुकशाहीच्या हातांत आहे, तोपर्यंत सामाजिक स्वातंत्र्य तर याच पण राजकीय क्षेत्रांतसुद्धा भिक्षुकशाही ब्राह्मणेतरांच्या उरावर थै थै नाचल्याशिवाय राहणार नाही. ईश्वर करो व हे आमचे भाकीत सर्वस्वी खोटे ठरो.
प्रकरण ६
त्याचा कार्यभाग बुडाला ||
* * * *
(२३) गेल्या शतकाच्या उत्तरार्धात झालेल्या ब्रह्मी युद्धाच्या हकिकती एकदा एक पेनशनर मेजर सुभेदार आम्हांला सांगत होते. ते म्हणाले की, "इंग्रजी सैन्याचा एवढा मोठा कडेकोट बंदोबस्त आणि इतकी कडकडीत शिस्त व टापटीप, परंतु ब्रह्मी लोकांच्या गनिमीकाव्यापुढे त्यांचे काही चालेना. ब्रह्मरी लोकांचा हल्ला केव्हां येई व चटकन् कुठे चुटकीसारखा नाहींसा होई, याचा कांहीं लागत नसे. तिकडे कळकीची दाट जंगले असल्यामुळे ब्रह्मी लोक त्यांतून भराभर दडून पसार होत, पण इंग्रजी सैनिक अगदीच नवखे असल्यामुळे त्यांचा पाठलाग त्यांच्याच पाठीमागे लागून १०-१५ मिनीटांच्या आतच ‘अरे! आ तो हूं छू !’ म्हणून छावणीला परत यावे लागत असे. लढाईला तोंड असे लागेच ना, यामुळे व्यर्थ कुचंबणा होऊ लागली. बरे, हल्लयांचा पाठलाग नेटाने केलाच तर हल्लेवाले कोठेंच न आढळता, खेडवळ ब्रह्मी लोकांची खेडी आपापले व्यवहार शांतपणे करीत असलेली आढळायची. इंग्रज सेनापति एवढे मोठे मुत्सद्दी, पण ही शांतपणे आपापल्या खेडवळी व्यवहारांत निमन्ग असलेली ब्रह्मी खेडींच या गनिमी हल्लयांच्या मुळांशी आहेत, एवढेंसुद्धां त्यांना पटेना! आणि दिवसेंदिवस इंग्रजी सैन्यांची तर नाहक कुंचबणा होऊ लागली.
अखेर एका रात्रीं मसलतखान्यात मी सुचविलें की ही ठिकठिकाणी विखुरलेली ब्रह्मी खेडी म्हणजे या हल्लेवाल्यांची नाके आहेत. तुम्ही त्यांच्या तटस्थपणावर किंवा शांतपणावर जाऊ नका. हीं नाके तुम्ही निर्दयपणाने ठेचल्याशिवाय या ब्रह्मी युद्धांचे तोंड उघडणार नाहीं. निःशस्त्र व तटस्य नागरीकांवर शस्त्र उचलायचे नाहीं. हा वेदान्त गोंडस आहे खरा, परंतु जेथे नुसतें तटस्थपणाचे सोंग घेतलेले आहे. येथे हा वेदान्त काय उपयोगी ? भवति न भवति होऊन अखेर ब्रह्मी लोकांचे गमिनी हले बंद पाडण्यासाठी सुभेदार xxxx नी वाटेल ते करावें, असा हुकूम मसलतखान्यांतून सुटला. माझी पक्की खात्री होती की ही बावळट व खेडवळ दिसणारी खेडीच या हल्लेखोरांची काळिजे आहेत, या काळजांनाच हात घातल्याशिवाय हे गनिमी हल्यांचे ब्रह्मी दंगे खास बंद पडणार नाहींत. दुसऱ्या दिवशी अनेक सुभेदार व मी आपापल्या तुकड्या घेऊन निघालों आणि शिपायाना हुकूम फर्मावला की मागेपुढे काही न पाहता जेथे जेथें ब्रह्मी खेडी आढळतील तेथे तेथे बेधडक त जाळून पोळून फस्त करीत चला, खेडवळांच्या रज्याओरड्याकडे लक्ष देण्याचे कांही कारण नाहीं. हुकूम होण्याचा अवकाश, बारा मैलांच्या घेरांत ठिकठिकाणच्या खेड्यांचा भडका उडाला. युद्धस्य कथा रम्या ! त्या हलकल्होळाचे हृदयद्रावक चित्र तुम्ही आपल्या कल्पनासृष्टीतच पहा !! संबंध दिवसभर ही जाळपोळ होताच, संध्याकाळच्या सुमारास ब्रह्मी बंडेखोराचे पुढारी आपण होऊन इंग्रजी छावणीत दाखल झाले व म्हणू लागले की आम्हांला वाटेल तर फांसावर चढवा पण हीं जाळपोळ आता बंद करा ! अशा रीतीनें बंडखोर ब्रह्मी पुढारीच हस्तगत झाल्यामुळे, ब्रह्मी युद्धाच्या भरतवाक्याचा प्रसंग पुढे लवकरच साध्य झाला, हे सांगणे नको!!"
भिक्षुकशाहीचे बंडसुद्धा ब्रह्मी गनिमी काव्यानेंच आज इतकी शतकें चालू आहे. ब्रह्मीयुद्ध आणि ब्राह्मणीयुद्ध जवळजवळ समरस आहेत. या युद्धाचा लवकर निकाल व्हावा अशी ज्यांची मनापासून इच्छा असेल, त्यानी साम दाम दंड भेदादि जुनेपुराणे उपाय या उप्पर घोटीत न बसतां, धार्मिकपणाच्या मुखवट्याखाली डांकेखोरपणाचे गनिमी हल्ले चढविणाऱ्या, निरनिराळ्या भिक्षुकी ग्रंथांची ब्रह्मी खेड्यांप्रमाणेच वासलाद लावल्याशिवाय गत्यंतर नाहीं. निदान लाला लजपतराय म्हणतात त्याप्रमाणें त्यांच्यावर ‘मेजॉर ऑपरेशन्स’ करून, त्यातली भिक्षुकी घाण बाहेर काढली पाहिजे, आजला हिन्दु राष्ट्राला जी शोचनीय प्रेतकळा आलेली आहे, त्याला कारण ही मिक्षुकी घाणच त्याच्या पिंडाब्रह्मांडाला झोंबलेली आहे. हिन्दुत्वाची सुधारणा करूं इच्छिणारांना या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाहीं.
श्रुतिविरोधी जुने ग्रंथ आहेत तसेच प्रमाण धरुन हिन्दुधर्माची व हिन्दुत्वाची सुधारणा करूं म्हणणारे लोक एक तर महामूर्ख असले पाहिजेत किंवा अट्टल लुच्चे तरी असले पाहिजेत. वास्तविक खरें म्हटलें तर बुद्धिप्रधान [Rationa] सत्यसंशोधनाच्या या नवयुगांत मनुष्यांनी कोणत्याहि एका विशिष्ट ग्रंथांचे प्रामाण्य मानून त्या विवक्षित पंथाचे गुलाम बनू नये, हा उत्तम पक्ष व मतामतांच्या गलबल्याच्या वावटळीत पायाखालची वाळू घसरू नये, म्हणून श्रुतिसारख्या आद्यग्रंथांनाच चिकटून रहाणे, हा मध्यम पक्ष होय. श्रुतिप्रणित वैदिक धर्माचे स्वरुप लाला लजपतराय येणेंप्रमाणे वर्णन करतात :
The Vedic Dharma, like all great religious movements that have left their mark in the world, is not only a creed, but a complete system of thought, a complete code of guidance of humanity in all relations to life and all departments of human activity, a policy as well as a science of living-in short, a way of looking at things, a point of view. (Arya Samaj, P. 173) हे उद्गार श्रुतिविषयक उत्कट भक्तीचे व प्रेमातिरेकाचे आहेत. परंतु बुद्धिप्रधान चिकित्सक नवमतवादी म्हणतात:-- We know that all the riddles of the Universe had never been solved either in the Vedas, the Upanishads, the Puranas or in any Shastric or Unshastric literature of the Hindus however estimable they may be of whatever guidance they might have given to the people in the past. (Indian Rationalistic Society`s Bulletin Jan. 1921. P. 280.) अर्थात् बदलणाऱ्या प्रत्येक नवयुगाच्या मानवी आकांक्षांना व ज्ञानलालसेला तृप्त करण्याइतकी, फार काय पण दिवसेंदिवस प्रौढतम बनत चाललेल्या शास्त्रीय शोधांशीं समगामी राहण्याइतकी श्रुतिप्रणित तत्वज्ञानाची बीजरूपानेंच का होईना जर व्यवहारक्षमता (adaptability) आढळून येणार नाही, तर तेथे मात्र खुशाल स्वतंत्र विचार योजना करण्याचा अधिकार वाटेल त्यास असला पाहिजे. नाहींतर स्मृतिपुराणोक्त भिक्षुकी गुलामगिरीच्या आगीतून निघून ग्रंथप्रामाण्याच्या शाद्विक फुफाट्यात पडण्याचा अनवस्था प्रसंग यायचा ! वस्तुस्थिति कशी आहे ती पहा. ब्राह्मणांनी वाटेल ते ग्रंथ वाटेल तसे खरडून त्यावर (धार्मिकपणाची) सोवळ्या अधिकाराची धाबळी पांघरून ठेवली खरी परंतु स्वामी दयानंदानी हा खोडसाळपणा तेव्हांच उमगून त्या धावळीला दूर झुगारुन दिली. [आर्यसमाज पृ. ७३] हिंदु धर्मांत व्यक्तीला कांहींच महत्व नाहीं; महत्वाचा सारा गड्डा काय तो ब्राह्मणाच्या स्वाधीन, प्रत्येक ब्राह्मण म्हणजे खुद्द परमेश्वराचा प्रतिनिधी, त्याचा शब्द हाच कायदा. तो कोणी किंचित् मोडला पुरे की गेलाच तो नरकांत. ब्राह्मणाला कोणी निवडावें। लागत नाहीं, पसंत करावे लागत नाहीं, नेमावे लागत नाहीं, काही नाही. तो जन्मसिद्धच या सर्व अधिकारांचा भोक्ता असतो इतकेंच नव्हे तर गुणकर्माच्या किंवा शिक्षणाच्या बाबतीत तो जरी महाशंख असला तरी त्यामुळे त्याच्या या भिक्षुकी अधिकारास कांहीहि बाध येत नाही. धर्म कोणता आणि अधर्म कोणता हे याच बेट्याला माहित! निवळ जन्मप्राप्तीच्या (काकतालीय) न्यायावरच त्याचा सारा पावनपणा अवलंबून असतो. हल्ली हिंदु धर्म म्हणजे हजारों मतमतांतरे, पंथ, क्रियाकर्मे, चालीरीती आणि आचारविचारांचा असा एक अवाढव्य समुद्र बनला आहे की सेन्ससचे अधिकारी म्हणतात कीं
भटांची पूजा म्हणजे धर्माची कसोटी
हेच हिंदुधर्माचे मुख्य लक्षण होऊन राहिलें आहे. युरपांतल्या मध्ययुगीन् पोपांना धार्मिक नादीरशहांची उपमा देतात पण आमच्या इकडील भिक्षुकशाहीच्या अरेरावीपणाशी त्यांची तुलना केलीय, तर ते बिचारे निवळ कायदेबाज राजेच (Constitutional monarchs) उरतात. [आर्यसमाज पू. ६६-६७] हल्लीहि हिंदुस्थानांत असून असे भले बहादर आहेत की जे हीं वाटेल तेव्हां हिंदुस्थानाने विरक्त वृतीत सणाने एकलकोंडे रहावे, असे प्रतिपादन करितात. हे लोक प्राचीन काळच्या जुन्या म्हणून सोन्यासारख्या दिवसांचे मोठे चहाते असून, ते दिवस तसेच पुनश्च प्राप्त यावे म्हणून आपल्या जीवाची एकसारखी आटारेटी करीत असतात. असल्या मूर्खपणाच्या विधानांनी भरलेली पुस्तकें लिहून त्यांचा सर्वत्र प्रसार करतात. लोकांच्या मृदुल मनोवृतींना चेतविणाऱ्या कविता व गाणी लिहून त्यांचा फैलावा करितात. या असल्या लोकांना गद्धे म्हणावें की राष्ट्रघातकी म्हणावें, हें कांहीं मला समजत नाही. असल्या प्रकारच्या भिकार वाङ्मयापासून माझ्या देशबांधवांनी पूर्णपणे अलीप्त रहावें, असा मी त्यांना अंतःकरणपूर्वक कळकळीचा इषारा देतों. (नॅशनल एज्यूकेशन पृ. ७९-८०] भूतकाळच्या परिस्थितीत रहाण्याचा हट्ट हा केवळ फोल होय. नव्हे. अगदी मूर्खपणाचा आहे. आपल्याला आज जर कशाची विशेष काळजी घेणें जरूर असेल, तर ती भविष्यकाळाचीच होय.
प्राचीन आर्याबद्दलच्या आदराच्या बाबतीत मी स्वतः कोणासहि हार जाणार नाहीं, हे लक्षांत ठेवा. त्यांच्या संस्कृतीबद्दल दुसऱ्या कोणास जितका अभिमान वाटतो, तितकाच मलाहि वाटतो. अर्वाचीन मंडळींना प्रगति करता येण्याजोग्या स्थितीपर्यंत प्राचीन आर्यानी मानवी ज्ञानाची शिकस्त केली. त्यांचा शहाणपणा त्यांचें अध्यात्म, त्यांची नीति आणि त्यांची वाङ्मयपरिणति याबद्दल मला अभिमान वाटतो. पण आर्याच्या काळापेक्षां ज्ञानाच्या बाबतीत जगानें, आतांपर्यंत जी उच्चतम भरारी मारलेली आहे, त्याकडे मी कशी डोळेझाक करूं? आणि ज्ञानाचा (Knowledge) अर्थ जर चातुर्य (Wisdom) असाच असेल, तर जीन हजार वर्षांपूर्वीच्या जगापेक्षां आतांचे जग ज्ञानाच्या बाबतीत खात्रीनें पुष्कळच उन्नत झाले आहे, असें समजण्यास मुळींच हरकत नाही. [नॅश एज्यु ४३] फार दूर कशाला? माझी पक्की खात्री आहे की आर्याच्या पवित्र श्रुतींचे प्रवर्तक व संरक्षक, उपनिषदें दर्शनादि ग्रंथकर्त्यांचे प्रतिनिधि आणि मनु याज्ञवल्क्यादिकांचे अनुयायी हे सारे अज्ञानमग्न आणि मूढविश्वास मग्नच होते.
ज्या वैदिक धर्माने एके काळी प्रत्येक मनुष्य प्राण्याला विचार व विवेक-स्वातंत्र्य पूर्णपणें दिलें ज्या धर्मांत मतभेद नुसता क्षम्यच नव्हे तर आदरानें मान्य केला जात असे वेदग्रंथांचें अध्ययन पारायण व मनन करण्याची प्रत्येक व्यक्तीला (मग तो कोणीहि असो) ज्या धर्मानें पूर्ण मुभा ठेवली होती : प्रत्येक व्यक्ती आपल्या आत्म्याच्या बऱ्या वाईट गतीबद्दल स्वतः धनि, आपल्या आचारविचारांबद्दल परमेश्वराशी प्रत्यक्ष जबाबदार आणि त्या स्वयंसिद्ध तेजोराशी भगवंतापासून प्रत्यक्ष (कोणत्याहि मानवी दलालाच्या मध्यस्थीशिवाय) प्रेरणा प्राप्त करून घेण्याचा अधिकार सर्वांनाहि आहे, असें ज्या धर्मानें शिकविलें, तोच उज्वल आणि उदार हिंदुधर्म आजला अंधश्रद्धेनें भिक्षुकशाहीचा अधिकार मानण्यास भाग पाडणाऱ्या चीन- काळजाच्या पद्धतीचा एक पुरस्कर्ता होऊन बसला आहे. ज्या हिंदूंना पूर्वी कोणत्याहि मध्यस्थाची जरूर नव्हती आणि धार्मिक व अध्यात्मिक बाबतीतल्या पूर्ण स्वातंत्र्यांत जे पूर्वी धन्यता मानीत असत, त्यांनीच सध्या तीस कोटी देवांना आणि तितक्याच संख्येइतक्या ब्राह्मणांना आपले उद्धारक म्हणून बोकांडी बसवून घेतलें आहे. (Arya Samaj. p. 22.32) आतां, धर्मशास्त्रांसंबंधानें म्हणाल, तर मी स्पष्टच म्हणतों की आमचे सामाजिक व धार्मिक नियम पूर्वी काय होते याची निदान ओळख करुन घेणें हे कितीहि श्रेयस्कर असले, तरी हे लक्षांत ठेवले पाहिजे कीं आमच्या धर्मशास्त्रावरच्या प्रचलित उपलब्ध स्मृत्या अर्ध्याकच्या खुळचट, असंबद्ध आणि परस्परविरुद्ध कल्पनांनी व तत्वांनी नुसत्या सडलेल्या आहेत. अशा परिस्थितीत मनु नारद आपस्तंबादिकांच्या स्मृत्या आमच्या तरुण विद्यार्थ्यांच्या हाती देणें म्हणजे त्यांच्या मानसिक शक्तिची व्यर्थ ओढाताण करण्यासारखे आहे. (रा. एज्यु. पू. ७८]
हे वरील उद्गार दुसच्या तिसन्या कोणाचे नसून त्रिलोकविश्रुत लाला लजपतराय यांचे आहेत. तेव्हा त्यांच्या महत्वाबद्दल व सत्यतेबद्दल अधिक विवेचन करुन सूर्याला काडवातीनें उजेड दाखविण्याच्या फंदात आम्ही पडत नाहीं. लाला लजपतराय, महर्षि डॉ. रविंद्रनाथ टागोर आणि पूण्यपाद ऋषींद्र अरविंद घोस यांच्या ग्रंथाचे पारायण करणाऱ्यांना त्यांच्या उत्कट सत्यप्रतिपादनाविषयीच असूरी खोडसाळपणाचा चेंदामेंदा करतांना लालबुंद होणाऱ्या त्यांच्या सात्विक त्वेषाबद्दल ओळख करुन देण्याची अवश्यकता नाहीं. बोलपूर, पांदीचरी आणि लाहोर या तीन ज्ञानपीठांतून में उज्वल वाङ्मय अलिकडे जगप्रसिद्ध होत असतें. त्यांत राष्ट्रीय गुंडगिरीचा दुट्टपीपणा, मानभावीपणा किंवा दुतोंडेपणा मुळींच नसतो, पण आमचे विद्वान तरुण या वाङ्मयाचे परिशीलन, मनन व निदिध्यास करतील तर हराम एरवी, कॉलेजे व शाळा सोडून गांवभर हुंदाटण्या घालायचा धंदा कोणी करावा ?
`श्रुतिस्मृतिपुराणोक्त फल प्राप्त्यर्थम् ` ची शाब्दिक पोपटपंची करणारे भिक्षुक तर बोलूनचालून बाबावाक्य प्रमाणंचे कट्टे शागीर्द. वर्णाश्रमधर्माच्या पोकळ भोपळ्याला पोटापाण्याच्या प्रश्नाचा दांडा लटकाऊन, स्वतःच्या अकलेच्या द्वारा जीर्णमताच्या खुंट्ट्यानी घट्ट आवळून पुराणप्रवचनांचे जलसे करणाऱ्या ‘हर्दास’ पुराणिकांच्या कवट्यांवर बोलपूर लाहोर वाङ्मयाचे भाग्य सटवीनें लिहिल्याचे दिसत नाही. इतकेंच नव्हे, तर श्रुतिस्मृतिपुराणोक्त फलप्राप्तीसाठी उनाड पोळवजा मतिमंद भिक्षुकांच्या झोळ्या भरणाऱ्या शहाण्या पुण्यवानांच्या चित्रगुप्ती हिशोबात ही पुण्याई जमा पडल्याचेंहि दिसत नाहीं. असें नसते तर भिक्षुकशाहीच्या बण्डाला सांप्रत प्राप्त झालेली उर्मट कळा कधींच आली नसती.
भिक्षुकांच्या तोंडचा `शास्त्र` हा एकच शब्द वाटेल त्या शहाण्याच्या कमरेचे कांटे ढिले करूं शकतो. परंतु मद्रासचे अड्यार लायब्ररीचे डिरेक्टर श्री. ए. महादेव शास्त्री बी. ए. म्हणतात. " What we call Shastras are made up of texts of different values.........there are spurious additions and interpolations fathered upon the sages of lofty wisdom, but clearly indicative of the prejudices and idiosyncrasies of their real unscrupulous authors and quite unworthly of the holy names of the sages to whom they are attributed. (Vedic Law of Marriage p. 96-97) बॅरिस्टर एस्. सी. मुकर्जी याच मताचा पुरस्कार करून म्हणतात. " Shastras the fabricated and forged inter polations whereof are well-known but nevertheless doggedly adhered to as genuine, " (Decline & fall of the Hindus. p. 24) चिकित्सक विद्वानांचे असे असंख्य उतारे देऊन, प्रचलित धर्मग्रंथांचा फोलकटपणा वाटेल तसा सिद्ध करुन दाखविता येईल, परंतु स्थलाभाव आड येत आहे. सध्या याविषयी थोडी रूपरेषा दाखविण्याचा यत्न करीत आहोत. त्यावरुन भिक्षुकशाहीच्या ग्रंथप्रामाण्याच्या शास्त्रोक्त धिंगाण्याचे काही सें स्पष्ट करुन आमच्या वाचकांना पटेल अशी आशा आहे. स्मृतिग्रंथाबद्दल सामान्यत्वें आम्ही आपला अभिप्राय वर नमूद केलाच आहे. स्मृतीत चांगल्या गोष्टी मुळींच नाहीत, असे आम्ही म्हणत नाही; आहेत, पुष्कळ आहेत. परंतु चांगल्यापेक्षा वाईटाची त्यांत बरीच भेसळ आहे याचे कारण हे ग्रंथ भिक्षुकांनी ब्राह्मणांचे अवास्तव महात्म्य व स्तोम वाढविण्यासाठी लिहिलेले असल्यामुळे, त्यांत सत्याचा खून पडला असल्यास त्यांत कांही नवल नाहीं .
श्रुति (म्हणजे वेद) (Modern research however permits us to get to the historic origin and motive of those much vaunted"Texts "the genuineness whereof we are certainly in a position to impeach. It has now been clearly established that our Briddha Manu or the old Manu has been made to disappear and the present Manu, no redolent of Brahmanic superiority, has been redacted, recasted and re-edited several times to suit the Braman`s interest at a late post-Buddhistic age, as and when Hindu revivals took place from time to time in the wake of the numerous Brahmanic and pro-Brahmanic kingdoms which came into existence. Not only Manu but all our Shastric literature has been put through the same process for the purpose of creating a new Earth in accordance with Brahmanic pretensions, after the Buddhistic deluge. In the necessity of doing an, the history of the past had to be garbled, abandoning all sense of proportion and falsifying er ignoring the sequence of time, circumstances and contemporaneous events. Decline & Fall of Hindus. p.p. 28-29) व स्मृति यांच्या परस्पर अंतरंगाची छाननी करताना श्री. ए. महादेव शास्त्री म्हणतात, "ऋषींच्या निर्विकार व समतोल मनोवृत्तीत ज्या सनातन सत्यतत्वांचें प्रकटीकरण झालें, त्या तत्यांना वैदिक धर्म अथवा श्रुति असे म्हणतात आणि एका विवक्षित काळाकरितां, सामान्य अनुभवावरच भिस्त ठेवून तत्कालीन समयाचाराच्या काही ठोकळ ठरविलेल्या नियमांच्या संग्रहाला स्मृति असे म्हणतात. म्हणून स्मृतीचा अधिकार श्रुती (वेदा) इतका नाही. अशास्त्रसिद्ध गोष्टी व सामाजिक आचार यांचाच प्रामुख्याने स्मृतीत समावेश होतो व यावरील नियमच तींत असतात. म्हणून स्मृत्यांचा समावेश श्रुतिमर्यादेत होत नाही. (त्या श्रुतिबाह्य आहेत. ) अर्थात् त्या बदलू शकतात व शास्त्रीय शोध जसजसे होत जातात व सामाजिक परिस्थिती बदलली जाते, त्याप्रमाणे स्मृत्यांत सुधारणाहि करता येते. (यम् स्मृतीचे नियम बदलतात ?
पूर्वी निस्पृह स्पष्टवक्ते संशोधक असलेले, पण अलीकडे राष्ट्रीय कंपूत घुसल्यामुळे लोकमान्यतेच्या आधी लागलेले चिंतामनराव वैद्य एकाच तोंडाने सर्दगरम हवा सोडतांना म्हणतात की Law-giver नाही. Law Remembereror आहे. हाच सिद्धांत आमचा आहे. ईश्वराच्या आज्ञा त्याला ज्या स्मरल्या लिहून (?) ठेविल्या. त्याविरुद्ध आता दुसऱ्या आम्हा हिंदूना तरी मान्य करणे शक्य नाही. मनुयाज्ञवल्याचे कायदे सर्व काळाला योग्य असेच आहेत." (सार्व. सभा पुणे ज्यु. अंक.) ब्रेव्हो उड बी लोकमान्य वैद्य! महाभारत रामायणाची संशोधनपूर्वक सालटी काढून मनुस्मृति अगदी अलीकडची ठरविणारे रावबहादूर ते आपणच काय ? लोकमान्यतेची राष्ट्रीय मूस कोणाचे केव्हा कसे रूपांतर करील याचा काही नेम नाहीं म्हणतात ते खरे दिसतें एकूण! )
स्मृतीची व जनरूढीची मान्यता असलेले समयाचाराचे असे कितीतरी नियम स्मृतीत आहेत की ज्यांना श्रुतींत व शास्त्रांत (Science) आधार नाहीं, इतकेंच नव्हे तर कांही धडधडीत श्रुतिप्रामाण्याला व सायन्सला अगदी विरोधी असतात. याचे कारण शोधू गेलें तर तें, (नजर किंवा घोड) चुका, विशिष्ठ कार्याचे औचित्य, दुर्वासना, गर्व किंवा मत्सर यांतच सापडणार असल्या स्मृत्यांच्या आधारावर प्रचलित हिंदू लॉ. रचणाऱ्या शहाण्यांची काय तारीफ करावी? आणि स्मृतीतील वचनांना सनातनत्याची सफेदी पाहणाऱ्या पंडीतांची किती कीव करावी? मनुस्मृतीचे जनकत्व कांही हेकड जीर्णमतवादी वैवस्वत मनूच्या गळ्यांत बांधतात. याचे कारण अगदी उघड आहे. भिक्षुकी ग्रंथांना असेंच मागेमागे खेचीत नेण्यावरच त्यांच्या भिक्षुकी इभ्रतीचा सारा पाया आहे. मानवधर्मसूत्र नामक एका प्राचीन ग्रंथाच्या पोटांतून मनुस्मृतींचा जन्म झाला, असे काहींचे म्हणणे आहे; परंतु या ग्रंथाची विश्वसनीय अशी एकही प्रत अझून कोठेंहि उपलब्ध झालेले नाहीं. सध्यांची मनुस्मृति अत्यंत अर्वाचीन आहे. तींतील समाजव्यवस्थेच्या चित्रावरून ( हे चित्रसुद्धां छपन्न मसाल्याच्या भेसळीचे आहे.) तिचा काळ इ.स. २०० च्या पूर्वी नेतांच येणे शक्यच नाहीं. (I have come to believe that the author (of Manu Smriti) could not have lived before 200 A. D. and I am inclined to place him between 227 A. D. and 320 A. D.) हिचा कर्ता कोणी मगधदेशस्थ भृगूनामक भिक्षुक ( It was a strange irony of fate that the people who came forth as the expounders of Dharma were persons who had the least knowledge of the world. do. p. 69.) असून त्याने पौराणिकी घाटणीवर वैवस्वत मनूचा धागा आपल्या ग्रंथाला मोठेपणा, मान्यता व सोवळेपणा येण्याकरितां जोडून दिलेला आहे. नन्दांचा संहार करून भरतखंडाच्या साम्राज्यपदावर बसलेला चंद्रगुप्ताचा हस्तक जो विष्णुगुप्त चाणक्य त्यानें अर्थशास्त्र नांवाचा जो एक ग्रंथ लिहिलेला आहे, त्याचा काळ इ.स. पूर्व ३२१ ते ३०० आहे. त्यांतील राजनीति, समाजनीति इ. चित्रे नीट निरखून पाहिलीं तर तीं मनुस्मृतींतील समाजचित्रांपेक्षा बरीच प्राचीन दिसतात. अर्थात् मनुस्मृति हा ग्रंथ अगदी अलीकडच्या (What still more strikingly proves the priority of the "Artha Shastra " to the Smrities of Manu and Yajnyavalkya, as now extant, is the marked difference between the states of societies presented in them. The state of society portrayed in Artha Shastra is in the main pre-Buddhistic, though Kautilya wrote long after the time of Buddha, while the Smrities depict the ideal of the Hindu Society as reconstructed and reformed consequent on its struggle for existence against the all-victorious, but just then decadent Buddhism. - Artha Shastra, Int: xviii. By R. Shamashastri.) काळांत ब्राह्मण्याचे अवास्तव स्तोम माजविणान्या ब्राह्मणांनी लिहिलेला आहे, हे स्पष्ट सिद्ध होतें. जी गोष्ट मनुबोवांची तीच याज्ञवल्क्यपंताची आणि नारदभटजींची प्रत्येक शतकाशतकाला-नव्हे, दशकादशकाला मानव समाजाचे आचार व विचार उत्क्रांत होत असतात आणि त्याप्रमाणे त्याच्या सामाजिक व राष्ट्रीय जीवनांत कल्पनातील फेरफार होतात. हा सनातन सिद्धांत डोळ्यापुढे असूनहि हिंदू लॉ करण्याच्या वेळी तत्कालीन पंडितांनी १४०० वर्षांपूर्वीच्या रद्दड स्मृत्याच्या आधारावर तोल सांवरून १९ व्या शतकांतील हिदूंच्या सामाजिक चारित्र्याची मुर्खपणाने गळचेपी करावी, असला ज्ञानमांद्याचा मासला सानऱ्या जगाच्या इतिहासात एकट्या हिंदुस्थानातच सांपडेल, शिलार वंशातील जिमूतवाहनाने इ. स. १६ व्या शतकाच्या प्रारंभी दायभागाचे जे कांही ठोकळ नियम ठरविले.
त्यांच्याच आधारावर २० व्या शतकांतल्या हिंदूंच्या संसारांतल्या दायभागाचे नियमन व्हायें, ही उलट्या पावलांनी चालणारी प्रगमनशीलता ‘आम्ही स्वराज्यास लायख आहोत’ म्हणणाऱ्या हिंदूना लांछनास्पद नव्हे काय ? हिंदू लॅा आमूलाग्र बदलून टाकण्याची एक चळवळ बंगाल्यांतल्या कांही कौन्सिलरांनी व वकीलांनी सुरू केल्याचे वृत्तपत्रातून वाचल्याचे पुष्कळांना स्मरत असेल; पुढे या चळवळीचे काय झाले ते कळत नाही. चळवळींत बोलघेवडा वकील पडला की तिचे तीनतेरा झालेच म्हणून समजावें. हा अनुभव हिंदवासियाच्या चिरपरिचयाचाच आहे म्हणा! दायभागाच्या या जुन्यापुराण्या घरटाच्या घरघराटीनें जीर्णमतवाद्यांना उषःकालच्या साखरझोपेइतकी जरी चित्ताची प्रसन्नता प्राप्त होत असली, तरी सध्यांच्या या विश्वबंधुत्वाच्या व्यापक संसाराच्या नवयुगति, त्या घरटामध्यें लाखों हिंदूंच्या संसाराचे पीठ होत असतें हे न्यायमंदीरांतील निकालाच्या अहवालांचे परिशीलन केल्यास कोणासहि समजून येण्यासारखे आहे. हल्ली मनोरंजन मासिक पुस्तकांत
हिंदु स्त्रियांची कायदेशीर दुर्दशा !!
नामक जी एक उत्कृष्ट लेखमाला सुरू झाली आहे. तींत या सर्व गोष्टींचा उहापोह पद्धतशीर रीतीने होत असतो, त्याकडे आमच्या प्रिय बंधुभगिनी वाचकवर्गाचे लक्ष वेधणें आमचे कर्तव्य आहे. बॅरिस्टर मूकरजी म्हणतात की " To the priestly Brahmans must be ascribed the downfall and decay of the Hindus as a nation" [भावार्थ:-- राष्ट्रीय दृष्ट्या हिंदूच्या ऱ्हासाचे व अवनतीचे खापर बेशक भिक्षुकशाहीच्याच टाळक्यावर फोडले पाहिजे.] आणि स्मृतिग्रंथांच्या जोरावर भिक्षुकशाहीने हिंदुसमाजावर कायद्याच्या व नीतीच्या दृष्टीनें ज्या अनंत आपत्ती लादल्या आहेत त्यांचा विचार केला तर बैं. नूकरजी प्रभृति स्पष्टवक्त्यांच्या विधानाची सत्यता पटवायला रामशास्त्री प्रभुणे स्वर्गातून खाली उतरलेच पाहिजेत, असे मुळीच नाही. समाजधर्माच्या बाबतीत हिंदूनी भिक्षुकशाहीच्या ओंजळीनें आजपर्यंत प्याले तितकें पाणी पुरें झालें! या पाण्यानें त्यांच्या आंगचें खरें पौरुषत्वाचें पाणी मात्र नाहीसे झाले आहे. ‘जो दुसऱ्यावरी विश्वासाला | त्याचा कार्यभाग बुडाला’ हे समर्थाचे वचन किंचित् बदलून
जो भिक्षुकावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला ||
असे केले, तर ते की अंमलाखाली बौद्धिक गुलाम बनलेल्या हिन्दूच्या सांप्रतच्या चारित्र्याला तंतोतंत लागू पडेल, ग्रंथप्रामाण्याच्या सर्वव्यापी बागुलबोवाला अझूनहि भिणाऱ्या हिंदूंना एवढेच सांगणे येथे शक्य आहे की पूर्वीचें ते एकलकोंडा राष्ट्रीयत्वाचे दिवस विसरा. हिन्दूनी हिंदुस्थानांतल्या हिंदुस्थानांत सद्दीच्या जोरावर जो काही थोडाबहुत पराक्रम काकतालीय न्यायाने केला, त्याचे कोरडे गोडवे गाऊन या नवयुगांत तुमचा टिकाव लागणार नाही. प्राचीन संस्कृत भाषेंतल्या भाकड स्मृत्यापुराणांच्या शिफारसीवर या जगांत कोणी कुत्रासुद्धां तुमच्या माणुसकीला मान देणार नाही. ‘आमची भरतभूमी ही अध्यात्मभूमी आहे, तिला पाश्चात्यांचा अर्थवाद कधीहि परवडणार नाही’ असले दांभिकपणाचे उद्गार काढतांना, आजच्या हिन्दूपाशी अध्यात्म किंवा अर्थ यांपैकी काहीहि उरलेलें नाहीं. इकडे डोळेझाक करून चालायचे नाहीं. हल्ली जबरदस्ताच्या टिकावाचा काळ (Survival of the fittest) आला आहे. हिन्दूना साऱ्या जगाशी तोंड देऊन जिवंत रहावयाचें असेल, तर त्यांच्या प्रयत्नाची पहिली पायरी म्हणजे
भिक्षुकशाहीप्रणित गुलामगिरीचा नायनाट
ही होय. ह्या उलट्या काळजाच्या भिक्षुकशाहीने सबंध हिन्दु राष्ट्राच्या सर्वांगीण संसाराला एकप्रकारचें द्वाड आत्मघातकी वळण लावलें आहे. कलकत्त्याचे एक विद्वान गृहस्थ हल्ली युरोपांत फिरत असून त्यांनी तेथील परिस्थतीचा तुलनात्मक सूक्ष्म अभ्यास चालविला आहे. व या आपल्या चिकित्सक स्वाध्यायाची विस्तृत विवेचनात्मक माहिती कलकत्त्याच्या Indian Rationalistic Society`s Bulletin The Diary of an Indian Tourist (एका हिंदी फिरस्त्याची रोजनिशी) या मथळ्याखाली देत असतात. त्यांत एके ठिकाणी त्यांनी असे उद्गार काढले आहेत :
The East has its own maxim of life. It resigns to poverty, displays a make-believe contentment in abjectness and squalor, and smiles a sickly smile over all this lowliness, and looks up to the sky for the removal of the misery it endures. I have often asked myself the question, "Why does the East bring itself to that condition of mind and why is it in perpretual despair."
The answer to that, I believe, is that the East has no notion of the rigour of the law of life which nature has imposed upon it. That law demands obedience to the law of the struggle for existence with its concomitant by-laws viz. the adaptation to environment, the power of co-operation, sympathy, pride in one`s race, mental and physical development and the knowledge that year is going forward and not moving backward. It does not realise that everything in art, science and manufacture, which the genius of man has produced, belongs ipso facto to all races of man and that everybody must strive to get the benefit of it...... The East is individualistic and sweats and labours for individual domination and supremacy over others, it pines for prophetic vision for ruling over other minds. Every other man in the East is striving to be a prophet. Such procedure stunts the intellect and kills knowledge, and with the disappearance of the prophet all knowledge becomes extinct.
(I.R. Society`s Bulletin. p. 284.)
लाला लजपतराय याच विचारांना पुष्टी देतांना अगदी स्पष्टस्पष्टच म्हणतात : "Our people require to be assiduously and persistently taught that there is no such thing as Kismet, and that Karma is always controllable and manageable by one`s own efforts as well as by changes in one`s social environments......... (p. 60)......... The Indian mind has for some centuries been more or less in a state of captivity. The strict regulated life of the Shastras and the Shara, the rule of the priest, the lack of opportunities for education, the constantly disturbed conditions of the country, the philosophical pessimism of the creeds and the cults, the belittling of life by centuries of monasticism and ascericism, all had for some time combined to make life in India static rather than dynamic...... The result is that the India of the last thousand years has been more decadent than progressive-often going backward, rather than forward."
(Lala Lajpat Rai, National Education. p. 62-63.J धर्मशास्त्रे खरी असोत नाहींतर खोटी असोत, स्मृति पुराणे व्यासाच्या उद्रातून निघालेली असोत, नाहीतर बाळंभट नातूच्या मेंदूतून गळलेली असोत, या उप्पर हिन्दूनी ग्रंथप्रामाण्याच्या भिक्षुकी खोडांत अडकून राहणे केव्हाही श्रेयस्कर नाही. आम्ही हिन्दूजन हिन्दू साम्राज्यांतील स्वतंत्र नागरीक आहोत, ब्राह्मण भिक्षुकांचे गुलाम नव्हत, अर्थात् आमच्या घरांत अमूक एखाद्या ग्रंथाची मान्यता असावी किंवा मुळींच नसावी, हे ठरविण्याचा अधिकार व विवेक आमच्याच हाती असला पाहिजे. शिवाय अमुक ग्रंथ मान्य व अमान्य असल्याच्या सबबीवर कोणाहि व्यक्तीचे हिन्दुत्व हिरावून नेण्याचा अधिकार कोणालाहि नाही. बेरिस्टर मुकरजी असे राणकाऊन सांगतात की : - The Hindu-world, depleted as it is, must for the sake of its own future life dethrone the Brahman priest from the Guruship of the Race and break down the rigid walls of the Caste-System and refrene its " marriage code" and " Code social " in the re-adjustment and putting our own house in order, would show that we are still a living race and not mere mummies in the museum with scriptural" Texts " stamped on our foreheads.
(Decline and Fall of the Hindus. p. 30)
[भावार्थ:--हिंदुजन सध्यां कवडीमोल झाले आहेत; त्यांना जर आपल्या भावी जीवनाची (जिवंत रहाण्याची) कांही चाड असेल, तर त्यांनी पहिल्याप्रथम या भिक्षुकशाहीच्या ब्राह्मणाला हिन्दूच्या गुरुपदावरून खाली खेचून पदच्युत केला पाहिजे; जातिभेदाच्या तटबंदी भिंती पडून जमीनदोस्त केल्या पाहिजेत आणि सध्या जी सुधारणेची संस्कृति आपल्याला लाभलेली आहे. तिला सुसंगत अशी विवाहाचा कायदा व सामाजिक आचारविचारांची बंधने यांची पुनर्घटना केली पाहिजे. ही सामाजिक पुनर्घटना जर आम्ही केली व आमचे स्वतः चेंच घर नीट ठाकठीक व्यवस्थेत बसविलें, तरच आम्ही कोणी जिवंत माणसे आहोत असे जगाला दिसेल; नाहींतर टाळक्यावर श्रुतिस्मृति ग्रंथांचा शिक्का मारलेली ही कोणीतरी प्रदर्शनांतली सुकवून वाळवलेली मढी आहेत, असे जग म्हणू लागेल.] म्हणे ना कां जग! जगाची पर्वा मुर्दाड भिक्षुकशाहीला काय होय ?
महाभारत आणि रामायण :- हिन्दूच्या वाड्यांत या दोन महाकाव्यग्रंथांचें फार महत्व आहे. त्यांतील काव्याने साऱ्या जगाला मोहनी घातलेली आहे. त्यांतील कित्येक प्रसंग ऐतिहासिक दृष्ट्या विनमोल आहेत, तर कित्येक विचारक्रान्ति करण्याच्या कामी जगांतल्या कोणत्याहि स्फूर्तिदायक वाङ्मयास हार जाणार नाहीत, असे आहेत. परंतु या दोनही ग्रंथांवर भिक्षुकशाहीचा हात फिरलेला असल्यामुळे त्यांचे स्वरूप सांप्रत अत्यंत विकृत व भ्रष्ट झालेलें आहे. रामायण आणि महाभारत, या दोन ग्रंथांचे यावज्जन्म परिशीलन करणारे विद्यमान चिंतामणराव वैद्य ज्यांना महाराष्ट्राने भारताचार्य ही सार्थ पदवी देण्यांत आपल्या रसिकतेचा व गुणग्राहकतेचा अत्यंत सदुपयोग केलेला आहे. याचे (१) Maharashtra A Criticism, (२) Epic India, (३) Ramayan - A Raiddle आणि अलीकडे मराठीत प्रसिद्ध झालेला महाभारताचा उप संहार हे ग्रंथ वाचकांनी मुद्दाम वाचावे, अशी शिफारस आहे. त्यावरून या दोन महाग्रंथांतल्या घालघुसडीचा इतिहास चांगला कळून येईल. येथें या ग्रंथांची छाननी करावयाची नसून त्यांत भिक्षुकशाही मतांचे कांटेसराटे कसेकसे घुसडले गेले आहेत, याची अगदी थोडक्यात माहिती द्यावयाची आहे. महाभारताचे प्राचीन शुद्ध स्वरूप कसे असावें व त्यांत मागाहूनची घालघुसड किती असावी याचें संशोधन करण्याचे जगद्व्याळ कार्य श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी सं.औंध यांच्या प्रोत्साहनानें
भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे
या संस्थेने हाती घेतलें आहे. ही फार प्रशंसनीय गोष्ट होय. तिकडे पाश्चात्य देशांतहि कित्येक विद्वान् संशोधक या ग्रंथांचे कस्सून संशोधन करीत आहेत. वर सांगितलेले हिन्दू फिरस्ते मि. चतरजी नुकतेच १० जुलाई १९२० रोजी स्वीडन देशांतल्या मालमो (Malmo) गांधी गेले असतां, त्यांची व प्रो. डैन्स ॲन्डरसन नामक एका महर्षीची गांठ पडली होती. त्या मुलाकतीची हकीकत इ.रॅ.सो. च्या फेब्रुवारी १९२१ च्या अंकांत आलेली आहे. महाभारताबद्दल संभाषण चाललें असतां प्रोफेसर अॅन्डर्सन म्हणाले की "महाभारत ग्रंथ घुसडाघुसडीनें मनस्वी सडलेला आहे. हिन्दुस्थानच्या हिन्दु लोकांची मनेंच चिकित्सक (Critical) नाहीत. ते चिकित्सकपणाचा डौल आणतात, परंतु धर्ममताचा पगडा बसतांच त्यांच्या मनांवर ढगारें येतात आणि ती तात्पुरती चिकित्सक वृत्ति तात्काळ कलंडते. व्यास ही एक नुसती काल्पनिक व्यक्ति आहे; परंतु भोळसट हिन्दु मनोवृत्तीला तो कोणी खरोखरच होऊन गेला असेल असे वाटते." महाभारत ग्रंथ अनेकांच्या हाती लागल्यामुळे मनस्वी वाढून फुगला आहे. याबद्दल पाश्चात्य व पौर्वात्य संशोधकांचे अगदी एकमत आहे. या निरनिराळ्या आवृत्यांचा काळ निश्चित करण्याचे येथे प्रयोजन नाही. परंतु एवढी गोष्ट खरी की बौद्धधर्माचा पाडाव करण्यासाठी भिक्षुक शाही ब्राम्हणांनी जेव्हा कंबरा बांधल्या, तेव्हांपासून महाभारताप्रमाणेच रामायणादि इतर सर्व ग्रंथातल्या क्षेत्रिय महात्म्याला कायमचा चाट मिळून त्या ठिकाणी भिक्षुकी महात्म्याच्या खऱ्या खोटया गोष्टी घुसटण्याचा धूमधडाका सुरू झाला. महाभारत आणि रामायण पूर्वी क्षत्रियच्याच महात्म्याचे इतिहास ग्रंथ होते. ते भिक्षूकशाहीजमा करून त्यांचा नायनाट करणे भिक्षुकशाहीला शक्य नव्हते. इतका त्यांचा प्रसार व मान्यता दांडगी होती. अर्थात् धार्मिक आणि भौद्धिक बाबतीत इतर सर्व लोकापेक्षा भिक्षुकी वर्चस्वाचे देव्हारे माजविण्याचा कृतसंकल्प केलेल्या भिक्षुकशाही लोकांची मने भिक्षुकी साच्यांत दडपून भिक्षुकी सत्तेला मान वाकविण्याइतकी कमजोर व बेअक्कल बनतील, अशा धोरणावरच्या काल्पनिक कथोपकथांच्या रद्दीने ते ग्रंथ फुगविण्याचा सपाटा सुरू केला व त्यांत त्यांना परशुरामाच्या कृपेने पूर्ण यश आले.
प्राचीन क्षत्रिय ग्रंथांना भटाळण्याचा (brahmanize) प्रयत्न करण्यांत बुद्धधर्माच्या उदारमतवादाच्या मुस्कटदाची हाहि एक मुख्य हेतू होता हे लक्षांत असावे. मॉनिअर विल्यम्सच्या मताप्रमाणे महाभारत आणि रामायण हे दोन ग्रंथ भटाळून सोडण्याचा उपक्रम इ. रा. पूर्व ४ च्या शतकात सुरू झाला. या कामी जे कवि पुढे सरसावले ते सर्व भिक्षुकशाहीच्या अड्ड्यातले इरसाल ब्राम्हण होते. ही भिक्षुकी ग्रंथरचना एकदम एकाच भिक्षुकाच्या हातून पार पडलेली नाही क्षत्रियेतिहासाला भटाळण्याची ही राष्ट्रीय चळवळ पुढे कित्येक शतक एकसारखी चालूच होती, ज्या ज्या श्लोकात क्षत्रियांचा पराक्रम अत्यंत स्पष्ट व उघडाउघड व्यक्त होत होता. अशा श्लोकांत काव्यकल्पनात्मक कूटे ढकलून, त्यावर असंभवनीय चमत्कार कल्पित गोष्टी इत्यादिकांची चुरचुरीत फोडणी देऊन त्या श्लोकांतली अर्थस्पष्टता विकृत व गढूळ करून सोडली. याच एकदोन ठळक उदाहरणे देतो.
रामायणांत दशरथ राजाने ध्वनिशरसंधानाने धडपडीत एका ब्राम्हणपुत्राचा वध केला; ब्राम्हणवधाबद्दल मग तो कळत असो वा नकळत असो-मनुस्मृतीत भयंकर शिक्षा ठोठावलेली आहे परंतु मी वानप्रस्थाचा पुत्र असलो तरी ब्राम्हण नव्हें!` अशी त्या मरत्या माणसांची लटकीच जबानी पुढे करून दशरथाची नुसत्या पुत्रशोकाच्या शापावर पुराणकारांनी मोकळीक केली आहे. रामायणात श्रीरामचंद्राने परशुरामाचा धनुर्युद्धात पार धुव्वा उडवून त्याचा पराभव केला, ही हकीकत नीट काळजीपूर्वक वाचली म्हणजे निश्चित निर्णयाचा कसलाहि थांग लागू नये म्हणून त्या गोष्टीवर नाना प्रकारच्या कविकल्पनांची काटेरी जाळी पुराणकारांनी यथास्थित पसरून ठेवलेली आढळतील. महाभारतातील वनपर्व व शांतिपर्वात भीष्मानेहि परशुरामाचा जो पराभव केला आहे. तेथेसुद्धा क्षात्रतेजाचा वरचढपणा सिद्ध होऊ नये म्हणून आयत्या वेळी काहीं ऋषीमुनींना समरभूमीवर मध्यस्थीकरिता आणले आहे आणि त्यांच्याकडून
तूं छान लढलास व तूंहि छान लढलास
अशा नुसत्या तोंडपुजेपणाच्या सारवासारवीवर या भीष्मपरशुराम युद्धाचा खरा रिपोर्ट पुराणकारांनी दाबून टाकला आहे. परशुरामाच्या इतिहासावर अवतारपणाचे जे पांघरुण घातले आहे, त्याच्याखाली क्षत्रियांच्या पराक्रमाचा बराचसा खरा इतिहास दडपला गेला असावा, अशी कै. रमेशचंद्र दत्तानी शंका व्यक्त केली आहे, ती काही अगदीच खोटी नव्हे. वामनावताराचें बीज पुराणकारांनी ऋग्वेदाच्या कोठारांतून आणून त्याचे पौराणिक कल्पनेशी कलम करून त्यांतूनसुद्धां क्षत्रियांच्या तेजोभागाची एक चुरचुरीत कादंबरी निर्माण करायला सोडली नाही. ऋग्वेद मण्डळ, अ. ४ सूक्त २२ येथे खालील ऋचा आढळतात :---
अतो देवा अवन्तु नो यतो विष्णुर्विचक्रमे |पृथिव्याः सुप्त धामभिः १६
इदं विष्णुर्विचक्रमे श्रेधा नि दधे पदम् |समूळहमस्य पांसुरे १७
त्रीणि पदा वि चक्रमे विष्णुर्गोपा अदाभ्यः । अतो धर्माणि धारयन् १८
या एवढ्या बारीकशा कविकल्पनेच्या कणावर क्षत्रिय बलीच्या अधःपाताची आणि ब्राह्मण वामनाच्या श्रेष्ठतेची केवढी टोलेजंग इमारत भिक्षुकशाही पुराणकारांनी उठवून दिली पहा. वशिष्ठ विश्वामित्राच्या झगड्याची कादंबरी याच भिक्षुकी उद्देशांतून जन्म पावली आहे. ब्राह्मणांच्या (The episode which relates at full Vishvamitra`s quarrel with the great saint Vashishtha, and the success of the former, though a kshatriya, in elevating himself to a Brahman`s rank, introduces the wildest hyperbole, with the manifest object of investing the position of a Brahman with unapproachable grandeur, and deterring others from attempts in the same direction.) अनुलंध्य वर्चस्वाचे स्तोम माजविण्याच्या या भिक्षुकी प्रवृत्तीची अक्कल अखेर तर भृगूनामक ब्राह्मणाकडून
विष्णू भगवंताच्या छाताडावर लाथ
मारण्यापर्यंत पाळली या भिकारडया कल्पित गोष्टीतले नवलातले नवल म्हणजे परमेश्वराच्या छाताडावर भिक्षुकशाहीच्या इरसाल ब्राह्मणाने लाथ मारली हे नव्हे. क्षीरसागरात शेषासनावर लोळत पडणाऱ्या श्रीविष्णूने ती लाथ एखाद्या अजागळ भंगडाप्रमाणे निमूटपणाने सहन केली हेंहि नव्हे, तर त्या लाथेचें चिन्ह जें वत्सलांच्छन ते विष्णूने मोठ्या गौरवाने व्हिक्टोरिया क्रॉसप्रमाणे अगदी आतांपर्यंत उघड्या छातीवर धारण केलें आहे. हें होय. परमेश्वराच्या नशिबी इतका उघडउघड बेशरमपणा व नामर्दपणा बांधणाऱ्या कवीच्या भ्रष्ट मनः स्थितीची धन्य असो, यापलीकडे अधिक कोण काय म्हणू शकेल? महाभारत रामायण व पुराणें प्रसविणाऱ्या शहाण्यांनी क्षत्रियांवर आणखी एक उपकार करून ठेवला आहे की मोठमोठ्या प्राचीन क्षत्रिय वंशांच्या मूळपुरुषाचे धागे अचूक ब्राह्मणी ऋषीमुनींच्या पोटांतल्या आंतड्यांना नेऊन भिडविले आहेत. याचे कारण एवढेच की एखाद्या वेळीं क्षात्रपराक्रमाचा इतिहास जपानी बाहुली प्रमाणे कलवंडून दडपिता आला नाहींच आणि दुर्देवाने क्षात्रपराक्रमाची स्तुति करण्याचा कुप्रसंग भिक्षुकी लेखणीवर आलाच तर " मग त्यांत काय झाले ? अहो बोलून चालून आद्यबीज तर आम्हा ब्राह्मणांचंच ना?" असा क्षत्रियांना अपमानास्पद शेरा मारून मोकळे! बरें, विचारक्षमतेच्या दृष्टीने तरी क्षत्रियांना कांही मार्क शिल्लक ठेविले आहेत काय? मुळीच नाहीत क्षत्रियराजे म्हणजे भिक्षुकशाहीच्या हातची मेणाची बाहुली. सारे भिक्षुकशाहीच्या विचार- पाणपोईवर ओंजळ लावून पाणी पिणारे, दशरथाचा दरबार घ्या, धर्मराजाचा घ्या, धूतराष्ट्राचा घ्या, जरासंधाचा घ्या, नाहींतर परिक्षितीचा घ्या, सर्वांच्या सभोंवार भिक्षुकी सल्लामसलतगारांचा टोलेजंग अड्डा कंबरखुंट बांधून बसलेला ठिकठिकाण वर्णन केलेला आढळतो. अकलेच्या साऱ्या बँकांचे डायरेक्टर काय ते भिक्षुकशाही ब्राह्मण. त्यांच्याशिवाय राजाच्या नित्यनैमित्तिक कर्माचे सुद्धां पान हालायचे नाही.
सारांश. महाभारतादि भिक्षुकी ग्रंथातले ब्राह्मण व क्षत्रिय यांचे परस्पर संबंध पाहिले, तर क्षत्रिय म्हणजे कोटच्या झाडाचा पाला आणि ब्राह्मण म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराच्याहि छाताडावर लाथ मारणारे शापादपि शरादपि असे सृष्टिविधात्या ब्रह्मदेवाचे बाप, रामायण आणि महाभारत या दोन ग्रंथांतील पात्रे काल्पनीक किंवा खरी हा वाद जरी सोडला, तरी ऐतिहासिक दृष्ट्या या दोन महाग्रंथांची भिक्षुकशाहीनें पार नासाडी केलेली आहे. अशाहि परिस्थितीत या ग्रंथांच्या रचनाकालच्या हिन्दुसमाजाच्या चित्राची थोडी फार कल्पना करता येणे अशक्याच आहे, असें मात्र नव्हे. नुसत्या सामाजिक चित्राचाच जरी विचार केला तरी त्यावरून
महाभारतानंतर रामायण
बऱ्याच काळाने रचिलें गेलें असावें असें तेव्हांच दिसून येतें. महाभारतांतली क्षत्रियांच्या क्षात्रतेजाची उरलीसुरली तडफसुद्धा रामायणातल्या क्षत्रियांत दिसून येत नाही. जिकडे पहावें तिकडे पुळपुळीत आणि मुळमुळीत कारभार राजापासून रंकापर्यंत प्रत्येक स्त्रीपुरुष भिक्षुकशाहीचा बंदा मिंधा गुलाम, जनकच पहा ना. औपनिषदिक युगांतली त्याची आत्मविश्वासाची तडफ, आत्मशक्तीच्या प्रचीतीची बिनमुर्वत प्रौढी आणि क्षात्रतेजाच्या वर्चस्वाची त्याची बेगुमान मर्दुमकी, ही सारी रामायणांत पार मावळून जाऊन, तेथे तो भिक्षुकशाहीच्या गुब्बगुब्बूला मान हालविणारा एक शेळपट नंदीबैल बनलेला दिसतो. रामाचाहि प्रकार तोच. परशुरामाशी युद्ध करतांना त्याचा तो अक्षात्र विनय काय, त्याच्या त्या अनार्यजुष्ट सबबी काय, साराच प्रकार नामर्दपणाचा! रामायण अथपासून इतिपर्यंत वाचून खाली ठेवले की, हिन्दुस्थानांतल्या हिन्दूचे शौर्ययुग संपून गुलामगिरी सुरू झाली व गंगानदीच्या प्रदेशांत शेकड़ों वर्षे वसाहत करून राहिल्यामुळे हिन्दु कार्याच्या प्राचीन आर्यतेजाचा ऱ्हास झाला तो या रामायणरचना काळीच झाला, असे वाटल्याशिवाय रहात नाही. महाभारतांतली कांही कांही पात्रे हिरवट खरी पण त्यांच्या दणकटपणांचा नुसता वाससुद्धा रामायणांत येत नाही. महाभारतातल्या युद्धांतली चिकाटी व कडवेपणा तर रामायणातल्या रामरावणयुद्धसुद्धा औषधाला मिळत नाहीं. कर्ण, दुर्योधन, भीमासारख्या पौरुष पात्राचा जागताजोग स्वाभिमान निश्चयाची मुसंडी त्यांत तिळमात्र नाही. कोठे ती मोठमोठ्या मुत्सद्याच्या बुद्धिमत्तेला तोंडबेड्या ठोकणारी आणि कीचकासारख्या पाजी मनुष्याच्या धसळामुसळीला दाद न देता त्याचा कपाळमोक्ष करणारी द्रौपदी, आणि कोठे.
रामाच्या चिंतनानें मी राम बनलें
अशा कवित्वावर समाधान मानून मुळमुळ रडणारी सीता! जमीन अस्मानाचा फरक !! रामायणातली पुरुषपात्रे म्हणजे शुद्ध मेंग्या मेणाची. रामानें रडत रडत म्हणायचे "बाळा लक्षुमणा, चार पैसे म्हणजे एक आणा आणि लक्ष्मणाने म्हणायचे "होय दादा "रामायणातल्या लढायांतले लढवय्यांचे वर्तन शुद्ध यांत्रिक आणि जुलमाच्या रामरामासारखें दिसतें त्यात महाभारतीय योध्यांची युद्धप्रियतेची लालसा, मारू किंवा मरूंची तडफ अथवा निश्चयाचा दणदणाट मुळीच नाही. रामायणकाळी हिन्दुसमाजावर भिक्षुकशाहीचा जबरदस्त पगडा बसलेला दिसतो. हकनाहक भिक्षुकशाहीचे गुलाम बनलेल्या व भिक्षुकी मध्यस्थीनें स्वतः सह पूर्वीच्या व पुढच्या बेचाळीस दुणें चौऱ्यांशी पिढ्यांचा उद्धार करूं पहाणाऱ्या शहाण्यापेक्षा रामायणातले स्त्रीपुरुष फारसे सुधारलेले दिसत नाहीत. येथून भिक्षुकशाहीच्या गुलामगिरीचा पाटावरवंटा थेट इसवी शकाच्या २० व्या शतकापर्यंत बिनबोभाट घडघडत येऊन, श्रुतिस्मृतिपुराणोक्त मंत्राखाली आजला सारी हिन्दुजनता भिक्षुकांची दास बनली आहे. लोकशाही स्थापना करण्याची पुराणे सागणाऱ्यांना स्वतःच्या डोळ्यांत वाढलेली हीं भिक्षुकशाहीप्रणित बौद्धिक गुलामगिरीची मुसळे दिसतात किंवा नाही हे कांहीं सांगवत नाहीं, परंतु भिक्षुकशाहीची पाळेमुळे खणून काढून प्रत्येक हिन्दुमात्रानें आपले आत्मिक स्वातंत्र्य जाहीर केल्याशिवाय लोकशाहीचे बीज या भरतभूमीत जीव धरणार नाहीं, एवढा आमचा नम्र परंतु स्पष्ट इषारा येथे नमूद करून ठेवलेला बरा, भविष्यकाळ आपला इतिहास लिहिण्यास समर्थ आहेच!
[२४] भिक्षुकशाहीच्या बण्डाचा इतिहास इतका सर्वव्यापी आणि त्याच्या मायावी बाजारांतल्या धामधुमीचे धागेदोरे इतक्या दूरदूरवर पसरलेले आहेत, की त्या सर्वांचे समर्पक उदघाटन करू म्हटले तरी प्रस्तुत ग्रंथाएवढे आणखी दहा ग्रंथ लिहितां येतील. परंतु एवढा उपद्व्याप करण्याची आवश्यकता नाही. कोर्टापुढे येणाऱ्या साक्षीदाराला एकाच मुद्यावर असत्यवादी ठरविल्यानंतर त्यांच्या साक्षीतल्या इतर सटरफटर चऱ्हाटाकडे लक्ष देण्याचें जसें कारणच उरत नाही, त्याप्रमाणे भिक्षुकशाहीच्या बण्डाचा गुप्त खोडसाळपणा इतक्या स्पष्ट रीतीनें आपल्या दृष्टीला पडताच त्यांच्या इतर कसल्याहि बचावाच्या पुराव्याकडे लक्ष देण्याची मुळीच आवश्यकता नाहीं.
वरवर विचार करणारांना असे वाटण्याचा संभव आहे की भिक्षुकशाहीनें फक्त धार्मिक बाबतीतच काय ती बंडाळी केलेली आहे. परंतु आतांपर्यंत सिद्ध केलेल्या अनेक मुद्यांच्या आधारानें या भिक्षुकी बण्डाचा छडा लावण्याचा कोणी यत्न केल्यास, या बण्डाच्या आम्हां हिन्दुजनाच्या चारित्र्याच्या सर्व भागांत इतक्या खोलवर जाऊन भिडलेल्या आहेत, की आमच्या सांप्रतच्या शोकजनक अवनतीबद्दल भिक्षुकशाहीचीं कृष्ण कृत्येंच सर्वस्वीं जबाबदार आहेत, असें सत्याच्या साक्षीनें त्यास स्पष्ट कबूलच करणे भाग पडेल. संप्रत हिन्दुस्थानावर नवयुगाची प्रभात उगवली आहे व तिच्या तेजानें आमच्या अनेक राष्ट्रीय गुणदोषाचे स्वरूप स्पष्ट दृश्यमान होऊ लागले आहे. उत्क्रांतीच्या गार वाऱ्याने आमची विचारशक्ति जागृत होऊन ती दाही दिशाकडे टौकारून पाहू लागली आहे. विवेक दृष्टीवर बाजलेली भोळसट अंधश्रद्धेची चिप बुद्धिप्रधान तात्विक प्रवृत्तीच्या शुद्ध जलाने धुवून काढून आत्मोन्नतीच्या द्वारे राष्ट्रोन्नति चटकन कशी साधतां येईल, याचा मार्ग शोधण्याकडे राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तिमात्राचें लक्ष लागले आहे.
मराठ्यांचा भगवा झेंडा
अटकेवर नेऊन, भीमथडीच्या घोड्यांना काबुल कंदाहारचे पाणी पाजण्याच्या आकुंचित बातबेताची मर्यादा आजला अवाढव्य वाढून हिंदुस्थानाच्या खऱ्याखुऱ्या एकराष्ट्रीयत्वाचे हिरवे राष्ट्रीय निशाण लंडन पेरीस अमेरिकेच्याहि मस्तकावर नाचवून सारा पृथ्वीचा गोल हिन्दु आर्याच्या संस्कृतीच्या मगरमिठीत प्रेमाने कवटाळण्याच्या उदात्त महात्वाकांक्षेने आजला साऱ्या हिन्दुस्थानाचे सात्विक अंतःकरण स्फूर्तीने फुरफुरू लागले आहे. हे कार्य अर्थात् लिहिण्याबोलण्याइतके सोपें नव्हे! जगाला बंधमुक्त करू पहाणाऱ्यांनी प्रथम स्वतः बंधमुक्त होऊन, स्वकीयांच्या बंधवोधनाचे कार्य पूर्ण यशस्वी करून दाखविले पाहिजे. स्वातंत्र्याची अपेक्षा करण्यापूर्वी स्वतःगुळे इतर कोणाच्याहि स्वातंत्र्यावर घाला पडत असेल, अगर त्याच्या गुलामगिरीच्या या अधिकाधिक दृढ होत असतील, तर त्यांचे बंधविमोचन प्रथम केल्याशिवाय मुसल्या अपेक्षेच्या हाका आरोळ्यांना स्वातंत्र्यदेवता कधीहि भाळणार नाही, सामाजिक, धार्मिक व राजकीय अत्याचाराच्या जुलमी रक्ताने हिन्दुस्थानाचे तोंड सध्या इतके माखलेले आहे की. अशा त्या गलिच्छ तोंडाने त्याला
स्वयंनिर्णयाचा गायत्रीमंत्र
म्हणण्याचा अधिकारच पोहचत नाही. तोंडावर लिहिलेले सामाजिक जुलमाचे खुनशी रक्त पुसण्याचा प्रामाणिक यत्न न करितो, हिंदुजन तसेच पिटाईनें हा गायत्रीमंत्र जपू लागतील, तर त्या मंत्राच्या उद्दिष्ट क्रियेपेक्षा त्याची प्रतिक्रियाच त्यांच्या समूळ उच्चाटनास कारणीभूत झाल्याशिवाय रहाणार नाहीं बौद्धिक गुलामगिरीने माणसांसारख्या माणसांना पशूंपेक्षाहि पशू बनविण्याचा व्यापार बिनधोक चालविण्याच्या भिक्षुकशाहीच्या सामाजिक व धार्मिक अवडंबराचे जोपर्यंत आमूलाग्र उच्चाटन होणार नाही, तोपर्यंत या हिन्दु राष्ट्रांत स्वातंत्र्याचें बीज कधींच जीव धरणार नाहीं हिन्दु राष्ट्रातल्या अनेक आत्मघातकी पातकांत (1) अस्पृश्यांवरील सामाजिक व धार्मिक जुलूम आणि (२) स्त्रीवर्गाची गुलामगिरी ही दोन महापातकें प्रमुख होता. राष्ट्राच्या पूर्ण अधःपाताचे मर्म शोधकाला येथेच सांपडते. या मर्माचे उच्चाटन करण्यासाठी गेल्या ५० वर्षांत बराच विचारविनिमय व आचारक्रान्ति होत आली. परंतु प्रगतीचे पाऊल मात्र जेथल्या तेथेंच, विशेष आश्चर्याची गोष्ट ही की स्वयंनिर्णयाच्या जोरावर लोकशाही स्वराज्याला आम्ही सर्वथैव पात्र आहोत असे जोरजोराने ओरडून सांगणाऱ्या हिन्दु राष्ट्रांत लोकशाहीच्या स्वयंनिर्णयाच्या मूळ तत्त्वालाच कुपथ्य करणारी ही दोन राष्ट्रीय महापातकें पूर्वीप्रमाणे होती तशीच सीलबंद राहिलेली आहेत व ती तशीच ठेवण्याचे गुप्त प्रयत्न भिक्षुकशाही करीत आहे.
कदाचित लोकशाहीच्या डोलाऱ्याची खरीखोटी घटस्थापना यथासांग झाल्यावर फुरसुद सांपडली-लहर लागलीतर या महापातकांचा केरकचरा वरवर झाडून साफ करण्याचा "राष्ट्रीय" प्राण्यांचा विचार असल्यास नकळे! परंतु जोपर्यंत आमच्या हिन्दुसमाजांत अस्पृश्य अवनती एवढी मोठी अगणित संख्या आहे व ती दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. तोपर्यंत हिन्दुस्थानला राष्ट्रीय भाग्याचे दिवस कधी येणार नाहींत हा लाला लजपतराय यांचा स्पष्टोक्तीचा इषारा.
चरकाच्या सुतानें स्वराज्य
मिळवू पहाणाऱ्यांनी वेळीच लक्षांत घेतलेला बरा. आजच्या चालू घटकेला भिक्षुकशाहीच्या स्मृतिपुराणोक्त चिथावणीमुळे हिन्दु म्हणविणारांकडून अस्पृश्य व अवनत हिन्दुबांधवांची जी मानसिक, बौद्धिक व आत्मिक मुस्कटदाबी करण्यांत येत असते, ती उघड्या डोळ्यांनी पहाणाराला, हिन्दुस्थानच्या स्वराज्य प्राप्तीची मुदत सात महिन्यांवरून सात शतकांवर न्यावी लागेल. गुलामगिरी-मग ती शारिरीक असो वा मानसिक असो ती एक महारोगासारखी व्याधि आहे. या व्याधीत खितपत पडणाऱ्या राष्ट्रांना व समाजांना आपल्या दुष्कर्माची घाणच येत नाहीं. इतर अवयवांप्रमाणेच त्यांची विवेकबुद्धिसुद्धा बधिर आणि आंधळी होते. त्यातल्या त्यांत बौद्धिक गुलामगिरी ही दृश्य नसल्यामुळे तीत बुजबुजणाऱ्या अनेक किड्यांचा सुळसुळाट गुलामी मनोवृतीच्या माणसांना भासतहि नाही. अस्पृश्यतेसारख्या महाभयंकर पातकाचे समूळ प्रायश्चित्त न घेतां त्याला अलग आनीगोंदीखात्यांत जमा करून नुसत्या सुताच्या रहाटाच्या पुण्याईवर राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळवू पहाणाऱ्यांच्या झटापटीत हे तत्व उत्कृष्ट रीतीनें व्यक्त झालेले पहाण्यांत येते. गुलामगिरी- मग ती कसलीहि असो- केव्हांहि झाल तरी वाईटच. त्यांतल्या त्यांत मानसिक ऊर्फ बौद्धिक गुलामगिरी अत्यंत चीड आणणारी होय. एखाद्या पानपतावर राष्ट्राच्या तीन लाख बांगड्याऐवजी तीनचोक बारा लाख बांगड्या फुटल्या तर त्याची कोणी भीति बाळगीत नाही ; कारण
हिंमते मर्दा मदते खुदा
या न्यायाने आज ना उद्या ‘बचेंगे तो और भि लढेंगे’ या दत्ताजी शिंद्याच्या मर्दानी वाणीची सत्यता पटविण्यासाठी तात्पुरते हतबल झालेल्या राष्ट्राचा अवशिष्ट अंकुर त्या फुटक्या बांगड्याच्या कपरी कपरी गणित सव्याज उसने फेडून घेतल्याशिवाय रहाणार नाही. परंतु मानवजातीच्या ३/४ भागाला अस्पृश्य नांवाखाली सर्वच बाबतीत गुलाम करून ठेवण्याचें कारस्थान केव्हांना केव्हातरी प्रतिक्रियेच्या चक्रांत कारस्थानी ईश्वरद्रोह्यांचे पीठ केल्याशिवाय खास सोडणार नाहीं, अस्पृश्योद्धाराचा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे, तितकाच तो भयंकरहि आहे आणि हा प्रश्न सुटल्याशिवाय हिन्दुस्थानाच्या राजकीय आकांक्षांना खऱ्या राष्ट्रीय स्वातंत्र्याची पालवीहि फुटणार नाहीं, अस्पृश्याचा प्रश्न काय किंवा भिक्षुकशाहीच्या बौद्धीक गुलामगिरीत कुझत पडलेल्या सर्व हिन्दुसमाजाचा प्रश्न काय, त्याची नीट वासलान लावली गेली नाही तर परकीय नोकरशाहीच्या घरटांत हिन्दुस्थानाचे पीठ होण्याच्या पूर्वीच स्वदेशी लोकशाहीच्या पहिल्याच घोटाला राष्ट्राला प्राणघातक ठसका लागून त्यांचे प्राणोत्क्रमण होईल. या गोष्टी क्षुल्लक आहेत, त्या आपण मागाहून सुधारू सध्या परकीय सत्तेचें जूं फेंकून देऊ या मागावून आपली (?) स्वतःची लोकशाही स्थापन झाल्यावर या गोष्टी आपण नीट ठाकठीक बस असले मागभावीपणाचे उद्गार काढणाऱ्यांना डॉ. रविंद्रनाथ टागोर यांचे खालील विचार आम्ही आहेर करून, हा मुद्दा समाप्त करू डॉक्टर म्हणतात. "आपण हे नीट लक्षांत ठेविलें पाहिजे की ज्या दोषी गोष्टी आपण क्षुल्लक समजून त्यांचा प्रसार व प्रचार समाजांत खुशाल चालू देतो, त्याच गोष्टी राजकीय क्षेत्रांत भयंकर व्यत्यय आणण्यास कारणीभूत होतील. सामाजिक क्षेत्रांतल्या जुन्या पुराण्या रीतीभातीच्या मढ्यापुढे डोके घासण्यास लावणारी आमची जी ऐदी वृत्ति राजकीय क्षेत्रांत आमच्या सभोवार बळकट तटबंदीच्या मोठमोठ्या तुरुंगवजा भिंती उभारून आम्हांला गिरफदार करायला मुळींच सोडणार नाही. ज्या संकुचित अनुदार प्रवृत्तीनें मानवी समाजाचा बराचसा मोठा भाग नीचपणाच्या निर्दय जोखडाखाली दडपून टाकण्यास आम्ही शक्त झालों, तीच अनुदार प्रवृत्ती राजकीय क्षेत्रांत अन्यायी जुलमांचा धांगडधिंगा अधिक जोराने घालण्यास खात्रीने बेफाम बनल्याशिवाय राहणार नाही. (पृ. १२३) आमचे सामाजिक निर्बंध सध्या सुद्धा जुलमी आहेत, इतके की त्यांच्यामुळे माणसे भ्याड आणि नामर्द बनत आहेत. साधारण अन्नव्यवहाराची गोष्ट ती काय? पण त्या बाबतीतल्या मतविरोधामुळे आम्ही आमच्याच असंख्य बांधवांचा जीव अगदी नकोसा करून सोडला आहे. ज्या सामाजिक सवयीमुळे आम्हांला इतकाही मतविरोध सहन होत नाही, तीच संवय राजकीय घटनेच्या बाबतीत अधिक दृष्टी बनेल व दडपशाहीचे नवे नवे उपाय शोधून काढून मानवी समाजाच्या जिवंतपणाची साक्ष पटविणाऱ्या प्रत्येक नवमतवादाच्या विध्या उडविण्यास त्या उपायांची जुलमी इंजिने सारखी चालू ठेवील. यांत संशय नाही आणि जुलूम सुरू झाला की त्याच्या मागोमागच ढोंगीपणा व खोटें कर्म या दोन गोष्टीनी राजकीय जीवन सडलेच जाईल.
अरेरे! नुसतें स्वातंत्र्य हैं नांवच इतके मौलवान आहे काय की त्याच्यासाठी आम्ही आपल्या नैतिक स्वातंत्र्यावरसुद्धा निखारे ठेवावे ? (पृ. १२४) ... या जहाल लोकांच्या ध्येयांत पाश्चात्य इतिहासाचा मसाला पडलेला आहे. हिंदुस्थानाच्या (Special problems) विशेष निकडीच्या गोष्टीबद्दल त्यांना मुळीच सहानुभूति नाहीं. आमच्या सामाजिक घटनेत काही असे विशिष्ट दोष आहेत की त्यामुळे आम्ही हिन्दुजन परक्यांशी तोंड देण्याच्या बाबतींत कमकुवत बनलेले आहोत. ही ढोबळ व सिद्ध गोष्टसुद्धा त्यांच्या गळी उतरत नाही. (डॉ. टागोरकृत नॅशनॅलिझम)
[२५] आता एकच मुद्दा उरला, परंतु तो इतका महत्त्वाचा आहे की, त्याच्याकरिता एका स्वतंत्र ग्रंथाचीच योजना आम्ही केलेली आहे अर्थात् त्याबद्दल येथे मौनच धरणें बरे. भिक्षुकशाहीच्या बण्डाला स्त्रियांच्या अज्ञानभाण्डारातून बरीच मदत होत असते आणि इतर कसल्याहि प्रयत्नाने या बण्डाला नामशेष सुद्धा उरू न देण्याच्या चळवळी यशस्वी झाल्या. तरी स्त्रियांच्या परवशतेचा, राष्ट्रदेवतांच्या गुलामगिरीचा, आमच्याच माताभगिनींच्या बौद्धिक अधःपाताचा प्रश्न स्वच्छ सुटल्याशिवाय भिक्षुकशाहीचे बण्डसुद्धा पुनः पुनः उपटल्याशिवाय रहाणार नाही. हे लक्षांत असावें `जावत्काल हिन्दु समाजातील स्त्रीवर्ग आम्हां भिक्षुकांच्या भजनी लागलेला आहे व आमच्या जन्मसिद्ध पावित्र्याची महति त्यांच्या अंतःकरणात भिनलेली आहे. तावत्काल आमच्या भिक्षुकशाहीचे वर्चस्व हाणून पाडण्याचे नकटा सुधारकांचे यत्न जेहेत्ते फोलच होणार !" या भिक्षुकी उद्गारांची सोपपत्तिक फोड राष्ट्रदेवतांची पायमल्ली या दुसऱ्या स्वतंत्र ग्रंथांत करण्यासाठी या ग्रंथाची समाप्ति येथेंच करितों. अखेर, ज्या जगदीशाच्या कृपेने व प्रेरणेनें स्पष्टोक्तीचे कांही विचार जनतारूपी जनार्दनाच्या सेवेला अर्पण करण्याची शक्ती व निर्भयता प्राप्त झाली, त्या परमेश्वराला अनन्य भावाने वंदन करून, वज्रप्रहार ग्रंथमालेच्या दुसऱ्या ग्रंथाकडे वळतो.