बजरंगी सोटा
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
प्रबोधन लघुग्रंथ माला
पुष्प २ रे
बावला मुमताज प्रकरणावर
प्रबोधनाचा
बजरंगी सोटा
लेखक
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे
प्रबोधन कचेरी, पुणे
जुलै १९२५
बावला-मुमताज प्रकरण
(मुंबई येथें सुप्रसिद्ध `मुंबई समाचार` या गुजराथी दैनिकांत “नामदार इंदोर महाराजांनी निर्दोषता” या मथळ्याखालीं प्रसिद्ध झालेल्या एका गुजराथी लेखाचा सारांश खाली देत आहोत. सं.प्र.)
आपण प्रथम हे लक्षांत घेतलें पाहिजे की, मुमताज ही महाराजांच्या जवळ एक विश्वासपात्र अशी स्त्री म्हणून राहिलेली होती. तिच्याजवळ दिलेल्या ५०/६० लाखांच्या जवाहिरावरून तिच्यावर महाराजांची किती मेहेरबानी व केवढा विश्वास होता हे सिद्ध होतें. परंपरा पाहिली तर असें दिसतें कीं, एकादी स्त्री, मग ती कितीही हलक्या कुटुंबांतली असो, हलक्या धंद्याची असो, हिंदु असो वा मुसलमान असो, तिला जर एकाद्या राजामहाराजानें किंवा बादशहानें आपली स्त्री मानिली तर तिला प्रत्यक्ष राणी इतकाच मानमरातब देण्याची वहिवाट आहे. याचे दाखलेच पाहायचे असतील तर गुजराथ, काठेवाड, आणि हिंदुस्थान येथें रग्गड आहेत. तेथें हिंदुराजांना मुसलमान रखेल्यांपासून झालेलीं मुलें त्या त्या राजांची संततीच म्हणून गणली जातात.
मुमताज ही मुसलमान असूनसुद्धां हिंदु नरेशाच्या प्रीतीला पात्र झाली आणि तिचा दर्जा व मानमरातबहि प्रत्यक्ष राणीसारखाच होता. स्वतःची योग्यता नीट आजमावून, मुमताज इमानानें महाराजांजवळ राहाती तर तिच्या पोटी जन्मास येणारी मुलें राजवंशीय म्हणूनच गणलीं गेलीं असती. मुसलमान रखेल्यांच्या पोटीं हिंदु राजांना झालेले राजपुत्र राजगादीचे मालक झाल्याची उदाहरणें काठेवाडांत घडलीं आहेत. अशाच प्रकारची स्थिति प्रस्तुत संबंधानें कल्पिल्यास अगदींच अशक्य असें कांहीं नव्हतें. प्रस्तुत संबंधांत अर्थात् एक समर्थ, लाखो प्रजाजनांचा मालिक, मोठ्या साम्राज्याचा नृपति आणि कोट्यवधि रुपये उत्पन्नाच्या भूमीचा सत्ताधारी अशा महाराजाधिराजाच्या राणीच्या पदवीला जाऊन बसलेली स्त्री ती कोण आणि तिचा दर्जा केवढा! अशी स्त्री नरेशाशी बेमान हॉऊ शकेल काय? आणि त्या स्त्रीवर पापदृष्टीने नजर टाकण्याची कोणाची तरी छाती होईल काय? आणि कोणी तशी नजर टाकली तर त्याला देहान्त दंडाशिवाय दुसरी कोणती शिक्षा मिळाल्याशिवाय राहील?
सामान्य जनसमाजासाठी केलेले कायदे राजेमहाराजांना मुळींच बंधनकारक होंऊ शकत नाहींत. `नराणांच नराधिपः` अशा महाराजाधिराजानें स्वीकारलेली, राणीच्या पदवीला चढलेली स्त्री स्वच्छंदी बनली, इतरेजनासारखी दुष्ट वृत्तीची झाली आणि उघड माथ्याने परपुरुषाशीं व्यभिचार आचरूं लागली, हा काय तिचा लहानसान अपराध? आणि अशा स्त्रीशीं जारकर्म करणारा नराधमही काय लहानसान पापी आणि गुन्हेगार समजावयाचा? मुमताज नर्तकी आहे, गायिका आहे, की हलक्या कुलशीलाची आहे, या मुद्याची येथें जरूरच नाही. आम्ही असे कितीतरी दाखले दाखवूं शकूं कीं, हलक्यांतल्या हलक्या कुळांत जन्मलेली अथवा जन्मानें मुसलमान असलेली, परंतु राजाच्या कृपेनें राणीपदाला चढलेली, अशा स्त्रीला आजपर्यंत सर्वांनी प्रत्यक्ष राणीच मानिली; आणि त्या स्त्रीच्या पोटी जन्मलेले पुत्र राज्याचे अधिकारी झाले. त्यांना चालू कायद्यानें आणि प्राचीन सनातन धर्मस्मृती पुराणांनींसुद्धां मान्यता दिलेली आहे.
आमच्या सनातन धर्मशास्त्राप्रमाणें आणि मुसलमानी धर्माप्रमाणें एकाद्या राजामहाराजाच्या किंवा बादशहाच्या प्रीतिपात्र स्त्रीशी जर एकादा अन्य पुरुष व्यभिचाराचा गुन्हा करील तर ती बेइमान स्त्री व तो पुरुष या दोघांनाही देहांत दण्डाची शिक्षा फर्माविली आहे. मुमताजच्या बाबतींत एवढें स्पष्ट आहे कीं ती अकरा वर्षे वयापासून, म्हणजे कौमार्यावस्थेपासूनच महाराजापाशी राहात होती. तेव्हांपासून तो ती तेथून पळून जाईपर्यंत तिनें आपल्या शीलाचा भंग परपुरुषस्पर्शानें केला नव्हता. आम्हाला कळलेली गोष्ट जर खरी असेल, तर असें समजतें कीं मुमताजला कमळाबाई हे नामाभिधान प्राप्त होण्यापूर्वी तिला विधिवत् प्रायश्चित देऊन तिचा संस्कारपूर्वक हिंदुधर्म प्रवेशविधि व तदनंतर महाराजाबरोबर तिचा शास्त्रशुद्ध पाणिग्रहण विवाहविधि झाला होता. ही गोष्ट खरी असो वा खोटी असो, ती कांहीं थोड्या व्यक्तींनांच माहीत असो अगर सर्वश्रुत असो; इतकी गोष्ट तर अगदी स्पष्ट आहे कीं, महाराजांनी तिला सर्व रीतीनें प्रत्यक्ष राणीप्रमाणेच वागविली. एकाद्या राणीवर जितका विश्वास टाकावा; तितक्याच विश्वासाने लाखो रुपयांचे जडजवाहिर तिच्या स्वाधीन केलें.
पण ती अधम यवनी अखेर आपल्या जातीवर गेली! आणि महाराजांच्या विश्वासाचा दुरुपयोग करून त्यांना पत्नी या नात्याने दिलेल्या वचनांशीं बेइमान झाली. बावलाला ह्या सर्व गोष्टी माहीत असूनहि त्यानें तिला फसविलें आणि तिच्याशी विषयलंपट बनून जो व्यभिचार केला, त्यामुळें तो महाराजांचा प्रत्यक्ष गुन्हेगारच झाला, आणि त्याला योग्य तोच दंड झाला. व्यभिचारी मुमताजलासुद्धां देहांत दण्डच व्हायला पाहिजे होता, पण ती बचावली. पूर्वीचा काळ असतां तर असल्या एका महाराजाच्या गुन्हेगाराला कोणत्याहि साम्राज्यांत थारा मिळाला नसता. आणि त्यासाठीं भयंकर रणसंग्राम झाला असता. परंतु आतां काळ बदलला आहे आणि वरील सबबींवर जर या गुन्हेगारांना ताब्यात देण्याबद्दल होळकर महाराजांनीं ब्रिटिश सरकारकडे मागणी केली असती, तर केव्हांहि न्याय्य आणि वाजवीच ठरली असती.
प्राचीन राजेमहाराजे आणि बादशहांचे जीवनवृत्तांत आणि त्यांच्या जनानखान्यांतील रहस्यें वाचणारांनी हे लक्षांत ठेविलें पाहिजे कीं, महाराजांची परिणित पत्नी काय किंवा त्यांच्या जनानखान्यांतल्या नाटकशाळा काय, त्यांना परपुरुषाकडे केवळ नजर टाकल्याबद्दल देहांत शिक्षा मिळाल्याची उदाहरणें इतिहासांत अनेक आहेत. स्वतःच्या उपभोगाकरितां ठेविलेल्या रखेल्यांनीं दुसऱ्यांशीं व्यभिचार कर्म करूं नये एवढ्याकरितां त्या निर्दोष असतांही त्यांच्या कत्तली झाल्याची उदाहरणें आपणांस माहीत आहेत. त्या गोष्टी जरी गतकालीन असल्या तरी विचारार्ह आहेत. स्वतःची स्त्री, सून, बहीण किंवा मुलगी ह्यांच्या शीलाची किंमत त्या काळी अमूल्य गणली जात असे. पण हल्ली सुधारलेल्या युगांत त्यांची किंमत कवडीमोल झालेली आहे. वरील गोष्टी सर्वच आम्हांस समंत नसल्या तरी महाराजांच्या प्रीतीला पात्र झालेल्या एकाद्या वस्तूची त्यांतल्या त्यांत अनर्व्य अशा स्त्रीरत्नाची किंमत कांही विशेष असते, हें सिद्ध आहे.
वाचकांनी त्याची कल्पना स्वतःच करावी. एकाद्यानें एकाद्या स्त्रीवर प्रेम केलें, आणि स्वतःच्या अर्धांगीप्रमाणे तिला प्रीतिपात्र आणि विश्वासपात्र मानून तिला सर्वस्व अर्पण केलें आणि अशा स्त्रीनें त्याचा त्याग करून दुसऱ्याचा आश्रय घेतला, तर त्याच्या मनाची स्थिती काय होईल? अशा तऱ्हेचा मनुष्य शांततेचा आणि दयाळूपणाचा जरी मूर्तिमंत पुतळा असला तरी, त्याच्या अंगांत जर मर्दानी रक्त सळसळत असेल तर, तो रक्तपाताचा प्रसंग आणल्याखेरीज खास राहणार नाही. वाचक, लेखक, वक्ते आणि वर्तमानपत्राचे संपादक लिहितेवेळी, वाचतेवेळी किंवा सभेमध्ये भाषण करतेवेळी अशा एकाद्या राजामहाराजावर अशा तऱ्हेचा प्रसंग आला असतां, त्याची मनःस्थिति कशा तऱ्हेची झाली पाहिजे, याचा थोडासुद्धां विचार कसे करीत नाहीत?
मुंबईसारख्या शहरांत दिवसाढवळ्या हा खून करणारे किंवा करवणारे सांपडले आहेत की, अजून पडद्यामागेंच आहे, आणि दिवसाढवळ्या मुंबईत खून तरी कसा होतो, असल्या ऐदी शंका विचारणारांना असा प्रश्न विचारतां येईल की, दिवसाढवळ्या बाबलाचाच खून का झाला? इतर हवाखाऊ स्त्रीपुरुषांपैकी एकाद्याचा कां झाला नाहीं? परंतु बावलाच्या पापाचे माप असेंच भरावयाचें होतें. त्याला कोणाचा काय इलाज? सिंहासारखा प्राणी, पण त्याच्या शिकारीवर रोख धरून येणाऱ्या बलवत्तर प्राण्याचाही तो संहार केल्याशिवाय राहात नाहीं आणि येथें तर एका महाराजाच्या प्रीतिपात्र अशा राणीच्या दर्जाला चढविलेल्या स्त्रीशी बावला उघडउघड व्यभिचार करतो; अर्थात् त्याला झाली हीच शिक्षा योग्य.
आम्हाला तर असें वाटतें कीं, असलें कर्म करणाराला असलीच शिक्षा व्हावयास पाहिजे. अफाट लोकसंख्येच्या आपल्या देशांत असले कितीतरी प्रकार झालेले आपण नेहमी ऐकतो, वाचतों. पण त्यासंबंधानें कोणी `ब्र`हि काढीत नाहीं. बावला तर प्रत्यक्ष गुन्हेगार होता. आजपर्यंत निर्दोष लोकांचे कितीतरी खून झाले असतील, पण त्यावेळी वर्तमानपत्रकारांची तोंडे बंद कां राहतात? स्वतःच्या शीलाचा यत्किंचितही भंग होऊं नये म्हणून आजपर्यंत कितीक निर्दोष राज्यांनी व साध्वी स्त्रियांनी बंदुकीच्या गोळ्यांचा सत्कार केला, त्याची कोणी कल्पना तरी केली आहे काय? `धीरांना दे प्रसंग हिंमत` हेच खरें. शेंकडों गुप्त अनाचार, गुप्त वध, गुप्त पापाचरणें सर्व देशभर पडद्याआड गुप्त घडत असली तरी त्यांची कोणी दक्खल करीत नाहीं आणि हा तर उघड उघड अपराधाचा गुन्हा! पण त्याच्याबाबतीत केवडा हलकल्लोळ! वाटेल त्या शंकाकुशंका काढून वाटेल त्या उच्च दर्जाच्या माणसांला खाली खेचण्याची खटपट करणे हीच ह्या सुधारणेच्या काळाची विचित्रता म्हटली पाहिजे.
वरील विवेचनावरून असें कोणीं समजूं नये कीं, ह्या भानगडींत महाराजांचा हात किंवा प्रेरणा आहे, असें असें आम्ही म्हणतो. आम्हाला इतकेंच सांगावयाचें आहे कीं, कांहीं बेजबाबदार वर्तमानपत्रवाले सांगतात त्याप्रमार्णे त्यांचा कांहीं संबंध असला तरीदेखील तो दोष ठरत नाहीं. बावला आणि मुमताज या दोघांनाहि पकडून आणण्याची महाराजांनी इच्छा केली असती तरी ते त्यांना शक्य होतें. ५०/६० लाख रुपयांचा जवाहिराची उचापत करणारी स्त्री, एकेकाळी स्वतःच्या पत्नीच्या दर्जाला पोहचलेली होती, एवढे एकच कारण तिला पकडून नेण्यास पुरेसें होतें. तिच्यावर सर्व सत्ता व मालकी महाराजांचीच होतीं, आणि तिला पकडण्याच्या बाबीमध्ये ब्रिटिश सरकारला कोणत्याहि प्रकारची हरकत घेतां आली नसती आणि ह्या दर्जाच्या स्त्रीशीं व्यभिचार करणारा बावला हा देखील महाराजांचा गुन्हेगारच ठरत होता.
परंतु जी स्त्री वचनभ्रष्ट झाली, निमकहराम बनली आणि शेवटीं आपल्या जातीवर गेली, अशा स्त्रीला परत बोलावून त्या भ्रष्ट स्त्रीला राणीपदाचा अवमान करणाऱ्या जारिणीला घरी पोसून ठेवायची, हें महाराजांना धर्माविरुद्ध कर्म वाटल्यास त्यांत काय चूक? बाजारबसवी बनलेल्या स्त्रीवर महाराज थुंकणारदेखील नाहीत. अर्थात्, अशा स्त्रीला महाराज परत बोलावतील ही गोष्टच खोटी आहे. याचा पुरावा कोरून उकरून जर काढलाच तर तो त्यांच्या एवढ्याच हेतूंत कदाचित सांपडेल कीं, मुमताज उचापत करून लांबविलेलें लाखो रूपयांचे जवाहीर परत कसे मिळवावें? ही इच्छा महाराजांनीं कधीं काळीं व्यक्त केली असेल, ती त्यांच्या भोवतालच्या मंडळींच्या कानांवर आली असेल आणि मुमताजच्या ताब्यांत असलेले लाखो रुपयांचे जवाहीर मुमताजला परत आणून आपल्या मालकाला परत मिळवून द्यावें आणि त्याचा फायदा करावा ही इच्छा कोणाच्या मनांत उत्पन्न झाली असल्यास नवल नाही. व यावरून महाराजांची प्रेरणा कोणी गृहीत धरली तर ते कदाचित् शोभून दिसेल.
वास्तविक इंदोराधिपति श्रीमन्महाराज तुकोजीराव होळकर हे इतके दयाळू आणि नीतिपरायण आहेत कीं, त्यांनी स्वतःचा भयंकर गुन्हा करणारांनांही सोडून दिलें आहे. अशा स्थितीत, जी एकेकाळी आपली प्रीतिपात्र असून आतां बेइमान झाली अशा एका क्षुद्र स्त्रीला महाराज हवी ती भयंकर शिक्षा करण्याचें मनात आणतील, ही गोष्टच अशक्य दिसते. आम्हाला असेही वाटतें कीं, हल्ला करणाऱ्या लोकांच्या मनांत बावलाचा खून करण्याचें मुळींच नव्हतें. परंतु बावलाच्याजवळ पिस्तुल होतें. आणि त्यानें गोळीबार केल्यानंतरच स्वतःचा जीव बचवावा आणि अंगीकृत कार्य तडीस न्यावें, ही इच्छा बलवत्तर झाल्यामुळे त्यांच्या मेंदूचा समतोलपणा ढळून त्यांनीहि गोळीबार केले आणि बावलाला जखमी केलें.
गोळीबार करून बावलाला जखमी करावें, हाही त्यांचा इरादा नसावा; पण स्वतःचा जीव बचावण्याच्या धांदलींत मनुष्याचे डोके ठिकाणावर राहाणे कठीण आणि सुटलेल्या गोळीनें मनांतल्या इच्छेप्रमाणे परिणाम करावा, हीही गोष्ट माणसाच्या हातची नाही. मारामारीच्या वेळी निशाणबाजी अचूक होत नाहीं व अशा तऱ्हेने सुटून गेलेल्या गोळींमुळे हा प्रकार घडला असावा. ज्यांच्यावर खुनाचा आरोप आला आहे, त्यांपैकी कोणाचाहि मुमताजशी स्नेहसंबंध किंवा जातिविशिष्ट कमलाहि संबंध नव्हता कीं, त्यांनी स्वतःचें प्रीतिपात्र दुसऱ्याच्या तावडींतून पकडून आणण्यासाठी प्राणघातकी हल्ला केला असेल.
त्या लोकांची इच्छा इतकीच असली पाहिजे कीं, आपल्या महाराजांच्या लाखो रुपयांच्या जवाहिराची उचापत करणाऱ्या आणि महाराजांचा विश्वासभंग करणाऱ्या स्त्रीला पकडून महाराजांच्या स्वाधीन करावी. त्यांपैकीच एकाद्याच्या मनांत त्या जवाहिरांपैकीं कांहीं आपण पचवावें, हीं इच्छा आली असेल नसेल देव जाणे! पण बहुतेक लोक आपल्या धन्याशी निमकहलालीनेंच वागत होतें. मोठमोठे हुद्देदार आणि मानकरी या बाबतीत सामील होते, यावरूनही हेच सिद्ध होतें.
आम्हास असें वाटतें कीं, ज्यांच्या हातून खून झाला ते लोक निर्दोष आहेत, आणि स्वतःच्या अन्नदात्यावरच्या भक्ति, प्रीति आणि एकनिष्ठा हीं प्रदर्शित करीत असतां अकस्मात बाबलाचा खून त्यांजकडून घडला. ह्याबद्दल एकाद दुसऱ्या वर्षांची शिक्षा देऊन त्यांना सोडून द्यावें. बावलाचा खून झाला ही गोष्ट अत्यंत दिलगिरीची आहे, पण त्याच्या पायानेच, अर्थात् एका महाराजाचा भयंकर गुन्हा केल्याच्या पापानेच ही आकस्मिक आपत्ती त्यावर कोसळली, असे तरी कां म्हणू नये? गुन्हेगाराला शिक्षाच व्हावी, हे तत्त्व जर अमलांत आणायचे असेल तर या बाबतीत कोणीहि शिक्षेस पात्र ठरणार नाही.
वर्तमानपत्रे ओरडतात त्याप्रमाणे महाराजांची या कार्याला प्रेरणा जरी असली तरी ती अयोग्य ठरत नाहीं. या निमकहलाल लोकांच्या बचावाकरितां महाराज पुढे सरसावले तर ती गोष्ट त्यांना भूषणावहच होईल. कोणाची प्रेरणा नसली तरी आपल्या राजाच्या राज्ञीपदाला पोहोचलेली स्त्री व्यभिचारिणी आणि विश्वासघातकीं बनली, हें सहन करणें शक्य न होऊन, स्वतःचीं राजनिष्ठा व्यक्त करण्याच्या भरांत त्यांच्या हातून असा भयंकर गुन्हा घडून गेला. अशा स्थितीत त्यांचा बचाव करणें त्यांच्या धन्यास योग्यच आहे.
एकादा राजा किंवा राजसत्ताधारी यांच्या बाबतींत ब्रिटिश कायदा सुद्धां मर्यादित आहे. राजांच्या धार्मिक किंवा सांसारिक व्यवहारांत ब्रिटिश कायदा ढवळाढवळ करूं शकत नाहीं. होळकर सरकारनी असे स्पष्ट सांगावें कीं, "मुमताजसारख्या स्त्रीशी आमचा संबंध होता. ती स्त्री खराब आणि विश्वासघातकी वर्तनाची निघाली. तिला पकडून आणण्यासाठी आमचे निमकहलाल लोक गेले तर त्याची जबाबदारी आमचेवर पडते. पण ते लोक निर्दोष आहेत आणि त्यांना कांहीहि शिक्षा ठोठावण्यापूर्वी ब्रिटिश सरकारने होळकर सरकारशी झालेला कौलकरार विचारांत घ्यावा."
आम्हां हिंदु प्रजेला आणि हिंदु पत्रकारांना माहीतच आहे कीं, कांहीं कांहीं संस्थानांतून अनेक कारस्थानें चालत असतात. किती तरी बनावट कुलंगडी उपस्थित होत असतात कीं जीं ऐकून कोणाच्याहीं आंगांवर रोमांच उभे राहातील. परंतु पुष्कळ वेळां या बाबतीत मौन धरणेंच योग्य असतें. ह्या बाबतीत तर आकस्मिकरीत्या घडलेल्या एका गुन्ह्याबद्दल एका महाराजावर तुटून पडणें आणि त्याला खाली खेचू पाहाणें हें आपलें खरें कर्तव्य नव्हे. ज्या ज्या श्रीमंत आणि सुखी कुटुंबांतील माणसें फासावर चढविण्यास पात्र झाली आहेत, त्यांच्याविषयीं मायाळू अंतःकरण करून त्यांच्या बचावाविषयीं खटपट करणें हेंच योग्य. जर ही गोष्ट मुसलमान राजा आणि हिंदु युवती यांच्या संबंधाची असती, आणि फाशी जाणारे लोक हिंदु असते, तर त्या बाबतींत मुसलमान पत्रकारांचे विचार कसें असूं शकतात, ह्याचा विचार प्रत्येक हिंदूने आणि न्यायी हिंदू पत्रकारांनी करणे जरूर आहे.
(ता. २० जून, १९२५)
संपादकीय स्फुट विचार
शिवाजीच्या रखेल्या
मुंबईचें माजी पोलीस कमिशनर व विद्वान इतिहास संशोधक मि. एस. एम. एडवर्डस् आयसीएस यांनी विलायतेस नुकतेंच कोठेसे प्रसिद्ध केलें कीं, `शिवाजी महाराजांनीं आठ रखेल्या ठेवल्या होत्या.` व्रणार्थ पशुच्या शिरावर वनीं उभे काकसे असे जे मुंबईचे टाइम्सकार त्यांना ही बातमी म्हणजे आकाशांतल्या बापाच्या पुत्रोत्सवाइतकीच वाटून, त्यांनी आपल्या नेहमींच्या हिंदुद्वेष्ट्या प्रवृत्तीला अनुसरून शिवाजीवर `अष्टपैलू अष्टावधानी,` इत्यादि उपहासात्मक कोट्यांचा भडिमार केला. हे भडीमार करणारे लेखक जातीनें इंग्रजच असतात असें मात्र कोणीं समजूं नये. हिंदुजनांची निंदा करण्यासाठी टाइम्स कचेरींत पुष्कळ भाडोत्री हिंदु लेखक `केवळ पोटासाठी` असला शिखंडीपणा गाजविण्यास नेहमींच सज्ज असतात.
टाइम्सनें शिवाजीच्या कुचाळ्या करण्यास सुरुवात करतांच, आमचे सर्व हिंदु पत्रकारलेखक आपापल्या लेखण्यांची टोकें पाजळून टाइम्सवर शिव्यांचा तोफखाना झाडूं लागले. हे सगळेच लेखणीबहाद्दर गोलंदाज म्हणजे इतिहासपंडित आहेत किंवा असतात असे मुळींच नाहीं. ज्या शिवाजीला आम्ही आतां अगदीं देव मानून सोवळ्या पंढरपुरी भावनेनें देवळें उभारून पूजीत आहों, त्या देवाची निंदा हा यवन एडवर्डस किंवा म्लेंच्छ टाइम्स कोण करणार? तुम्ही आमच्या शिवाजीला एक शिवी द्याल, तर त्याऐवजी आम्ही एक लाख शिव्यांचा मारा तुमच्यावर करूं.
एवढीच या सोवळ्या शिवभक्तांची उसाळी आणि तळमळ दिसते. टाइम्सला काय? दाणे टाकून कोंबड्या झुंजविण्यासाठींच त्यानें मुंबईस जन्म घेतलेला! ब्राह्मणेतरांनी भिक्षुकी पत्रकारांवर व पुढाऱ्यांवर सत्यवादीत्वाचा आरोप करणें जितकें मूर्खपणाचें आहे, तितकेंच अखिल हिंदुजनांनी टाइम्स क्रॉनिकल डेलीमेल प्रभृतीवर हिंदवी हितवादाचा विश्वास ठेवणें बेअक्कलपणाचें लक्षण आहे. शिवाजींने आठ रखेल्या ठेवल्या असे गृहीत धरलें तरी त्यानें काय कांदेवाडींतल्या जमनाजीं गमनाजी घरांत आणून ठेवल्या? का कोणाच्या लग्नाच्या बायका पळविल्या? का इंग्लंडच्या आठव्या हेन्रीप्रमाणें एकामागून एकेक राणीचा खून करून सहासात बायलांचा दादला बनला?
कांहीं संशोधक म्हणतात कीं, एडवर्डस साहेबांनी आकड्यांचा घोटाळा केला आहे. शिवाजीला सहा राण्या व दोन राखा होत्या. दोन राखा काय किंवा दोनशे काय, आकड्यांचा प्रश्न महत्त्वाचा नाहीं. शिवाजीनें राखा ठेवल्या तर, त्यांत अनीति कोठें घुसली आणि त्याचें चारित्र्य कलंकित झालें कसें? हाच वास्तविक महत्त्वाचा मुद्दा आहे. शिवाजीचा एक `रक्षापुत्र` मदनसिंग राणी येसूबाईबरोबर दिल्लीस गेल्याचा दाखला इतिहासांत आहे. रक्षेशिवाय रक्षापुत्र आला कोठून? तेव्हां शिवाजीला रक्षा मुळींच नव्हती या मुद्यावरचा वाद केवळ वितंडवाद होय.
रखेली ठेवण्याच्या मुद्यावर अनीतीचा शिक्का मारण्यास धाधावलेले कायदेपंडीत रखेली आणि रांड यांतला मुख्य भेद विचारांत घेत नाहींत. रखेली, राख किंवा रक्षा ही पत्नीप्रमाणेंच संबंधापूर्वी अक्षतायोनी असावी लागते. तिचा यजमानाशी प्रत्यक्ष विवाह लागलेला नसला तरी, तिला `कायदेशीर पत्नी` पदाचे सर्व हक्क मिळतात. हिंदु लॉमध्ये अवरुद्ध स्त्री, उपपत्नी, भोगस्त्री, दासी यांचे हे हक्क पूर्ण मानण्यांत येतात. मात्र विवाहबद्ध पत्नीइतकेंचं अखंड पातिव्रत्य रक्षेलासुद्धां चालवावें लागतें.
अशा उपपत्न्या ठेवण्याची चाल प्राचीन काळापासून हिंदु-मुसलमानांत अनिरुद्धपणे चालत आली आहे व ह्या उपपन्यांची मुलें आपल्या बापाच्या राज्याचे, जहागिरीचे किंवा इस्टेटीचे मालक झाल्याचीहि शेकडो उदाहरणे इतिहासांत आहेत. बाजीराव पेशव्याची मस्तानी ही कांहीं वेश्या नव्हे; ती श्रीमंतांच्या सौ. गोपिकाबाई इतक्याच अधिकाराची (पण विवाहविधीशिवाय पत्नी बनलेली) पट्टराणीच होती. रक्षा म्हणजे वेश्या नव्हे. शिवाय वेश्या असलेली स्त्री रक्षा म्हणून कोणी स्वीकारीत नाही.
आजचे तंजावर घराण्यांतलें भोसले रक्षावंशज आहेत; त्यांना कोणी वेश्यापुत्र म्हणणार नाही. राणी कीं रखेली हा प्रश्न विचारणाऱ्यांना हे कळतं नाही कीं, राणी ही विवाहबद्ध पत्नी असली, तरी विवाहविधीच्या चर्पटपंजरीशिवाय केवळ एकनिष्ठेच्या भावनेवर रखेली हीसुद्धां राणीपदाचाच मान अनुभवीत असते. आजपर्यंत राजेमहाराजे जहागीरदार ह्यांनीं रखेल्या ठेवल्या त्या पत्नीभावनेनेंच ठेवल्या व त्यांच्या पोटच्या पुत्रकन्यांना औरसाइतकाच मान देऊन त्यांचेंहि वंशवेलविस्तार वाढविले. यांत अनीति कोठें आली? विवाहविधींचे मंत्र म्हटले कीं, नीतीची विमा पॉलिसी उतरली असें थोडेंच आहे? लग्न रजिस्टर केलें म्हणजे तरी काय होतें?
पुरुषानें म्हणायचे `मी हिचा पती या जगीं असे` आणि स्त्रीनें म्हणायचें, `मी यांची पत्नी होऊ इच्छिते` व रजिष्टरानें दोघांच्या सह्या घेऊन `तथास्तु` म्हटलें कीं झालें. रजिष्टराच्या पुढे केलेलीं प्रतिज्ञा तेवढीं सोवळी आणि परस्पराकर्षि जोडप्यानें परस्परांनाच साक्ष ठेवून केलेला विवाह तेवढा `तस्साच` हे त्रैराशिक चालूं घडीच्या विवेकवादालासुद्धां मान्य नाहीं ; मग पूर्वीच्या रक्षापद्धतींत अनीति कशी? सारांक्ष रक्षा ठेवणें म्हणजे वेश्या ठेवणें नव्हे.
हे एक तत्त्व नीट पटलें तर शिवाजीविषयीं उत्पन्न झालेल्या वादाला ठिक ठिकाणी मोठ मिळणें फार कठीण नाही. मुमताझ प्रकरणांतहि टीकाकारांनी हा भेद अवश्य लक्षांत घेतला तर होळकरांवर होणारा निंदेचा मारा अयोग्य असल्याचें त्यांना दिसून येईल. मुमताझ कुमारी (Virgin) असतांनाच तिला होळकरांच्या नाटकशाळेचा मान मिळाला. तेव्हा ती इज्जतदार रखेली होती. पण तिनें बावलाकडे प्रयाण करतांच ती उघडउघड वेश्या बनली.
(प्रबोधन मासिक, जून १९२५)
हाहि एक गुप्त कटच दिसतो
बावलासारखी एक श्रीमान, परंतु क्षुद्र वर्तनाची व्यक्ती ती काय आणि त्याच्या खुनामुळे वर्तमानपत्रांत चाललेली बोंबाबोंब केवढी! हा सर्व प्रकार पाहिला कीं बावला हा या पत्रकारांचा कोणी थोर पूर्वज, मुंबईचा प्राण, ब्रिटिश राजसत्तेचा दण्डधारी, हिंदू मुसलमानांचा जगद्गुरू, श्रीराम-पैंगंबराचा अवतार कीं कोण वाटतो? असा प्रश्न उद्भवतो. एवढा मोठा लोकप्रिय कलेक्टर जॅकसन ठार मारला गेला आणि व्हाईसरॉय लॉर्ड हार्डीजवर बॉम्बचा मारा झाला, त्या वेळीसुद्धां मुंबईच्या पत्रांनी व विशेषतः मराठी पत्रांनी एवढा गुजराथी ऊर बडवून घेतल्याचें आठवत नाहीं. तेव्हां चाललेला हा सारा प्रकार म्हणजे ब्रिटिश राज्यांतला एक कांहीं तरी गुप्त कट असावा असें आम्हांला वाटतें. त्या शिवाय ह्या क्षुद्रसामान्य गोष्टींचा एवढा गाजावाजा भिक्षुकी व इस्लामी पत्रांनी करण्याचें कांहींच कारण दिसत नाहीं.
बॉम्बे क्रॉनिकलसारख्या स्वराज्यपक्षीय पोशिंद्या इस्लामी पत्रानें ह्या शंखध्वनींत विशेष अहमहमिकेनें भाग घेतला आहे आणि मुंबईच्या बहुतेक सर्व भिक्षुकांनीं आपापल्या पत्रांत दररोज बावलाचे पितृवत तर्पण चालविलें आहें. ह्या सर्व भानगडी जरी वरवर सत्यशोधनाच्या व लोकशाहीच्या इस्लामी व भिक्षुकी बुरख्यानें आपादमस्तक लपेटलेल्या दिसतात, तरी तो बुरखा इतका विरळ व पारदर्शक आहे की, या सर्व एडिटरांच्या लेखणीच्या दोऱ्या कोणी पटाईत गुप्तकटवालेच हालवित आहेत, असा दाट संशय आल्याशिवाय रहात नाही.
नुकतेंच हैदराबादच्या निझामसाहेबांविरुद्ध गुलबर्गा प्रकरणावरून खालसांतले हिंदु जनमत खवळलं होतें व आजही तें तसेंच आहे. बावला खुनाच्या क्षुद्र पराचा कावळा करून इंदोर प्रकरणावर आग पाखडण्याचा क्रॉनिकली उपद्व्याप म्हणजे निजाम निंदेच्या इस्लामी सुडाचा एक आडाखेबाज डाव नाहीं कशावरून? खिलाफत चळवळीचा इतिहास ज्यांच्या स्मरणांत ताजा असेल आणि सध्या संघटनांविरुद्ध मौलाना मौलवींचें जें लहानमोठे उघड गुप्त प्रयत्न धडाक्यानें सुरू आहेत, त्यांकडे ज्यांचे अवधान असेल, त्यांना आमच्या म्हणण्याचा गूढार्थ विशेष स्पष्ट करून सांगितलाच पाहिजे असें नाहीं.
गुलबर्गा प्रकरणानें खवळलेल्या हिंदुजनमतास निजामचें हैदराबाद कोपरखळीला विशेष कणखर लागल्यामुळें त्या बाबतींतील चर्चा चातुर्मासांतल्या पुराणाइतकीच अल्पायुषी झाली; परंतु इंदोर संस्थान जात्याच मवाळ हिंदु प्रवृत्तींचे असल्यामुळे भिक्षुकी व इस्लामी प्रवृत्ती असलेल्या पत्रकारांच्या कोपरखळीला तेथील माती विशेष मवाळ व भुसभुशीत लागली. त्यावर सध्या आपल्या थैमानाची शिकस्त करण्यास वृत्तपत्री कटवाल्यांस मुळींच कठीण जात नाहीं. इस्लामी आडाख्यानें इंदोर संस्थानच्या छातींत क्रॉनिकली जंबियाचा वार येनकेन प्रकारेण जेर झालाच तर संस्थानद्वेष्ट्या भिक्षुकी पत्रकारांनासुद्धां ती एक इष्टापत्तीच होईल. परस्पर पावणेतेरा हा भिक्षुकी कटांचा नेहमींचाच एक आडाखा आहे.
१८९६ सालच्या होळकर प्रकरणांत खालसांतल्या भिक्षुकी पत्रकारांनी इंदोरस्थ गुप्तकटवाल्यांच्या प्रेरणेनें कोणता भाग घेतलेला होता, हे मागील अंकी कै. धनुर्धारी यांच्या शब्दानेंच आम्ही स्पष्ट दाखविलें आहे. आजसुद्धा होळकरांच्या निंदेवर आपला आयुष्यक्रम रेटणारीं भिक्षुकी पत्रें इंदोरस्थ कटवाल्यांचेच हस्तक आहेत व सांप्रतचा त्यांचा शिमगा १८९६ सालच्या इतिहासाचीच पुनरावृत्ती आहे असें कोणास वाटल्यास तो तर्क चुकीचा ठरणार नाहीं. स्वदेशी संस्थानाविरुद्ध लोकशाहीच्या बुरख्याखाली भिक्षुकीपत्रकारांनीं केलेले अत्याचार ही एक अखंड परंपराच आहे. या परंपरेच्या तपश्चर्येच्या फलश्रुतीचा काळ जवळ आहे की लांब आहे, सांगणे कठीण आहे. तथापि, त्या दिशेचा भिक्षुकांचा निष्काम कर्मयोग इस्लामी संघटन- द्वेषाइतकाच करड्या निश्चयाचा आहे. हें किंचित विचाराअंती सर्वांस पटेल. खालसाप्रमाणेंच संस्थानांतूनही गुप्तकटांचे अड्डे असतात. या कटवाल्यांत पळीपंचपात्रीं खडबडविणाऱ्या भिक्षुकांपासून तो पदच्युत केलेल्या एकाद्या दिवाणापर्यंत किंवा राजोपाध्यापर्यंत सर्वं दर्जाच्या असंतुष्ट माणसांचा समावेश होतो. त्यांत `लग्न होय कीं कुंवार अजुनी` असल्या संशयांत बळी पडलेल्या सुंदराबाईपासून तों एकाद्या अडसुळाच्या कामाग्नींत भाजून निघालेल्या जिजाबाईपर्यंत सर्वं दर्जांच्या स्त्रिया असतात.
खालसांतील राजनीति देवदूतांची आणि संस्थानांतील मात्र सैतानांचीं असें नाही. राजनीतिच्या ठरावीक सरळ सोसाट्यांत जखमी राहाणें हा मानवी मनाचा धर्मच आहे. या धर्मातूनच राजसत्तेच्या लहानमोठ्या वर्मावर चोचा मारून मारून गुप्तकटांची कर्मे परिणत होत असतात. आजपर्यंत संस्थानी कटवाल्यांनी खालसांतल्या पत्रकारांच्या मदतीनेंच आपल्या खऱ्याखोट्या तक्रारींचा बागुलबोवा नाचवून संस्थानांविरुद्ध आपल्या छोट्यामोठ्या सुडाची रग जिरवून घेतल्याचे दाखले आहेत व आजच्या बाबला प्रकरणांतहि हाच प्रकार असावा असें अनुमान काढण्यास पुष्कळ जागा आहे.
ब्रिटिश सरकारचा मित्रद्रोह
ब्रिटिश सरकार आणि स्वदेशी संस्थानें यांचे जे करार मदार व तहनामें झालेले आहेत, त्यांच्या तपशीलावरून त्यांचे परस्पर दोस्तीचें व स्वतंत्र राज्यकारभाराचें नातें स्पष्ट सिद्ध होतें. आज राज्यकारभार व राजनीतिची शिस्त ब्रिटिश कायद्यांच्या अनुरोधानेंच संस्थानांत सर्रास चालू आहे. प्राणावर बेतली असतां जें ब्रिटिश सरकार या आपल्या दोस्तांच्या तिजोरीवर व सैन्यावर मध्यरात्री आपला हक्क सांगण्यास कचरत नाही; बाँबसारख्या किंवा सत्याग्रहासारख्या गुप्तकटांच्या चळवळींना जमीनदोस्त करण्यासाठीं जें ब्रिटिश सरकार या आपल्या दोस्तांच्या साहाय्याची याचना करण्यास मागेंपुढे पाहात नाहीं. तेच ब्रिटिश सरकार व त्याचें गव्हर्नर व्हाईसरॉयादि प्रातिनिधिक अधिकारी त्याच दोस्त संस्थानांची आपल्या मुलुखांत बेजबाबदार बीभत्स निर्भत्सना होत असतां एकाद्या मुर्दाडाप्रमाणें डोळ्यावर कातडें ओढून स्वस्थ बसतें.
ह्याला `मित्रद्रोह` पेक्षां दुसरें काय नांव देतां येईल? असें गृहीत धरलें की, भिक्षुकी पत्रकार दर्शवितातं त्याप्रमाणे राज्यकारभाराच्या किंवा एकंदर शिस्तीच्या बाबतींत ही देशी संस्थानें म्हणजे शुद्ध नरक होय. तर असल्या नरकाधिपतींचा दोस्तपणा ब्रिटिश नराधिपांना निःसंकोच मानवतो तरी कसा? परंतु ज्या अर्थी तो ब्रिटिशांसारख्या स्वाभिमानी व कदरबाज सत्ताधाऱ्यांना मानवतो, त्याअर्थी एकतर संस्थानविषयक, खोडसाळ गोष्टी या शुद्ध सत्यविपर्यासी असाव्या किंवा ब्रिटिश दोस्तांना सत्यासत्याची कांहीं चाडच नसावी. यापेक्षां तिसरा कोणता निष्कर्ष निघू शकेल? धारवाडचा कलेक्टर पेंटर तो काय आणि तेथील गोळीबाराबद्दल क्रॉनिकलविरुद्ध अब्रूनुकसानीची फिर्याद द्यायला मुंबईसरकार त्याला परवानगी देतें काय! लोकगांवच्या खटल्यांत केसरीनें सरळ चार शब्द लिहिले, तर त्यांतसुद्धा ब्रिटिश न्यायदेवतेचा अपमान होऊन ५००० रु. दण्डाच्या फासावर केसरीची मान लटकविण्यास ब्रिटिश राजसत्तेच्या इज्जतीनें मागें पुढें पाहिलें नाहीं.
राज्यसत्तेच्या इज्जतीसाठीं जें ब्रिटिश सरकार मानापमानाच्या इतक्या नाजूक रेशमी धाग्यावरसुद्धां कायदेबाजीची कसरत करायला एका क्षणाचाही अवधी दवडीत नाहीं; त्याच ब्रिटिश सरकारनें आपल्या रियासतींत दोस्त संस्थानिकांच्या आईमाईंचा प्रत्यक्ष उद्धार होत असतां पिरॅमिडप्रमाणें महंताची वृत्ती स्वीकारावी या मनोवृत्तीचें पृथक्करण करणें कठीण आहे. एरवीं जित्यामेल्या वाटेल त्या कायद्याच्या तपशीलाचे धागे रबराप्रमाणे ताणून ब्रिटिश इज्जतीला लवमात्र ढका लावणाऱ्यांना कायद्याच्या चापांत चेचणारें ब्रिटिश सरकार आपल्या होळकर दोस्तांची छिनाल भाषेंत बीभत्स निर्भत्सना करणाऱ्या बेजबाबदार निंदकांकडे अजिबात पाठ फिरवून स्वस्थ राहातें, तर तो प्रिन्सेस् प्रोटेक्शन अॅक्ट लोकमताला न जुमानतां अस्तित्वांत आणला तरी कशाला?
समान ऐश्वर्याच्या व समान सत्तेच्या विश्वासार्ह दोस्त नरपतींना बेजबाबदार टारगट पत्रकारांच्या शिवराळ चांदमारीच्या तोंडीं देणें याला जर मित्रद्रोह म्हणावयाचें नसेल तर याला दुसरा कोणता शब्द वापरावा, हें ब्रिटिश सरकारनेंच सांगितलेलें बरें. एकादा रस्त्यावरचा गंजड मनुष्यसुद्धां ज्या शिव्या व निंदा क्षणभरसुद्धां सहन करणार नाहीं, तसल्या शिव्यांचा व निंदेचा आपल्या दोस्त संस्थानिकांवर होणारा भडीमार पाहून ब्रिटिश सत्तेच्या प्रातिनिधिक अधिकाऱ्यांना मोठें भूषण वाटत असावे काय? आम्हांला आशा आहे कीं, मुंबईंचे नेक नामदार गर्व्हनर व व्हॉइसरॉयसाहेब प्रस्तुतच्या होळकर-निंदेच्या शिमग्याला कायदेशीर मार्गानें होळींत टाकून लोकमत विपर्यासाला शक्य तितक्या लवकर मूठमाती देतील.
स्वतःच्या दर्जाकडे पहा
होळकर सरकारवर टीकास्त्राचा मारा करणारे खालसांतलें लेखक व पत्रकार यांना `बेजबाबदार` हें विशेषण लावण्याची कारणें स्पष्ट आहेत. स्वतःला हे जरी प्रत्यक्ष चित्रगुप्ताच्या अधिकाराचे यमराजाश्र कलमधारी म्हणवीत असले, तरी खुद्द खालसांतल्या लोकव्यवहारांत या पत्रकार व्यक्ती लिलावांत फुंकण्यास काढल्या तर यांचा काय भाव येईल? ज्यांची लायकी आचारी पाणक्या किंवा जास्तीत जास्त गंधाचे रोळे व सुगंधी तेलें विकणाऱ्या कंपूपलीकडे मुळींच नाही. असले लोक स्वतःचा दर्जा विसरून जेव्हां मोठमोठ्या अधिकाऱ्यांवर एडिटरकीच्या घर्मेडीनें अद्वातद्वा कलमकसाईपणा गाजवतात, तेव्हां त्यांना कोणी भुंकल्या कुत्र्याची उपमा दिली तर त्यांत चुकलें कोठें?
आज महाराष्ट्रांतल्या अनेक पत्रांचे एडिटर `मागता येईना भीक तर एडिटरकी शीक` याच उत्पत्तीचे आहेत, हें ब्रिटिश सरकारच्या सीऐडी खात्याला पूर्ण माहीत आहे. महाराष्ट्रीय वृत्तपत्रांच्या कोल्हेकुईला सरकार मुळींच वचकत नाहीं यांचें कारण हेंच की तें या कलमसायांच्या बेजबाबदार चारित्र्याला पूर्ण पारखून बसलें आहे. आणि जनतेलाहि या एडिटऱ्या व्यक्ती काय शिलामोलाच्या आहेत हे माहीत नसतें असेंही नाहीं. स्वाध्यायशील, विवेकी, नीतिमान् व जबाबदारीने जनमताला सात्त्विक वळण देण्याची पात्रता कमविलेले आचारविचारसंपन्न लोक महाराष्ट्रीय जरनॅलिझमच्या क्षेत्रांत मोजूं म्हटलें तर एकाच पंजाची बोटें खास पुरतील. बाकी जिकडे पहाल तिकडे अनधिकारी कलमकसायांचा सुळसुळाट!
इतर क्षेत्रांप्रमाणेच या थोर दर्जाच्या क्षेत्रांतहि भटाभिक्षुकांच्या बेकार बाजारबुणग्यांनी बेगुमान बेरडगिरी माजविली आहे. प्रथमपासूनच हे क्षेत्र भिक्षुकांनी सर केलेले; त्यांत आतां राजद्रोहाच्या, सत्याग्रहाच्या, गुप्त कटांच्या, खोट्या चेकांच्या वगैरे अनंत अपराधांनी डागळून लोक व्यवहारात जवळजवळ बहिष्कृत पडलेल्या भिक्षुक तरुणांचा अमर्याद सुळसुळाट झाल्यामुळें, महाराष्ट्रीय जरनॅलिझम म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्यांचा पांजरपोळच म्हटला तरी चालेल. अशा या बेजबाबदार क्षुद्र व्यक्तींनी इंदोराधिपती होळकरांसारख्या स्वतंत्र व स्वयंनिर्णयी नृपतीची वाटेल त्या बीभत्स रीतीनं निर्भत्सना करण्यास उद्युक्त व्हावें, हा निःसंशय नैतिक अधःपात होय. कोठें होळकर आणि कोठें हे पत्रकार! काय पत्रकार झाला, म्हणजे ब्रह्मदेव झाला, का गव्हर्नर झाला, कां व्हाईसरॉय झाला, का बादशहा झाला?
रस्त्यावरचा टाळाचावीवाला जरा `अरे` म्हणतांच खाडकन् खेटराने तोंड रंगवून लहर लागली तर `कारे` म्हणतो आणि हे पत्रकार इंदोराधिपतीच्या निर्भत्सनेत एकहि नवी जुनी शिवी शिल्लक ठेवीत नाहीत! `कुत्तर भुकत वाको भुकवा दे` असे म्हणून हत्ती जरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, तरी भुंकण्याचा एकच हलकल्लोळ उडाला म्हणजे सहजच जाणाऱ्या येणाऱ्याला एखादा सणसणीत टोला त्या कुतरड्याच्या टाळक्यांवर हाणर्णे भाग पडतें. असले हे बेजबाबदार भिक्षुकपत्रकार म्हणे राजकारणी चर्चा करणार आणि देशाला स्वराज्य मिळवून देणार! ज्यांना देशी संस्थानाधिपतींच्या अधिकाराची व योग्यतेची जाणीवच नाहीं, त्यांनीं राजकारणीपणाची पोरकट मिजास तरी मिरवू नये, इंदोर कोल्हापूरचे महाराज म्हणजे मुंबईचे व्हिक्टोरीवाले, का पिठे फोडून देशभक्ती गाजविणारे असहकारवादी? काय समजतात काय हे पोटभरू पत्रकार? गोऱ्या सार्जंटाच्या गोऱ्यामोऱ्या चेहऱ्याच्या कदरीखाली शिस्तीचे पाठ घेत आयुष्य कंठणाऱ्या क्षुद्रांनी देशी संस्थानधिपतींच्या राज्यकारभारावर किंवा त्यांच्या अधिकारावर बेजबाबदार टीका करण्यापूर्वी स्वतःच्या लायकीची अजमावणी केल्यास निदान माणुसकीचा तरी आपणांत अभाव नाहीं, एवढें तरी त्यांना कळेल. ब्रिटिश साम्राज्यांत देशी संस्थानिकांचा दर्जा काय आहे व त्यांना कोणत्या व कोणच्या कायद्याचें बंधन आहे किंवा नाही, हे ब्रिटिश मुत्सद्दी व पार्लमेंट जाणून आहेत. कटवाल्या चिंधोट्या धांदोट्यांची कोल्हेकुई ऐकून ते जर ढुंगाचे डोक्याला गुंडाळून नाचूं लागले, तर ते काय भिक्षुक आहेत होय? ज्यांना स्वदेशीयांच्या अधिकाराची व योग्यतेची चाड नाहीं, त्यांना या जगांत कोण किती किंमत देणार व काय लायकीचे लेखणार याचा विचार झालेला बरा.
खुनशीपणाची परासीमा
बावला खुनाचा खटला सेशन कोर्टाच्या शेवटच्या शिगेला जाऊन कटवाल्यांचा लागायचा तो सोक्षमोक्ष लागला. तरी म्हणे या कटांतले पुढारी अजून सापडले नाहींत आणि सरकारनें या बाबतींत आणखी कस्सून चौकशी करावी. मग आतांपर्यंत झालें ते काय? कटाचा पुढारी फणसे ह्याने कटाचा उद्देश व त्याबद्दलची सर्व जबाबदारी व प्रेरणा आपली स्वतःची, असा स्पष्ट व सडेतोड जवाब देऊन जन्मठेप काळ्या पाण्याची शिक्षाहि पत्करली. तरी म्हणे पुढारी सांपडलाच नाहीं. असला आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ ब्रिटिश रियासतींत हाच पहिला दिसतो. हा पाहिला म्हणजे व्यभिचारिणी बायकोचा खून करून येणाऱ्या नवरोबाला मुंडासें धोंगडें पांघरून त्याचा गौरव करणाऱ्या पेशवाईला हसायला जागाच उरत नाही! आणि काय म्हणता? `या बाबतीत कोणी कितीही मोठ्या दर्जाचा मनुष्य असला तरी त्याचा ही सरकारनें मुलाजा राखतां कामा नये.`
ह्याचा असा ध्वनि निघतो कीं त्या खुनाच्या मुळार्शी खुद्द इंदोराधिपती श्रीमंत तुकोजीराव होळकर आहेत. पण तसें स्पष्ट कोणी का बोलत नाही? स्पष्टवक्तेबाजीची घमेंड असणारांनी वास्तविक हा आरोप स्वतः पुढे येऊन धैर्यांने उघड करावा आणि आपल्या विधानाचा पुरावा पटविण्यासाठी सरकारला खुशाल उघड मदत करावी. तसें न करतां भाषाबाजीचे हे पारदर्शक शिखंडी डावपेच कशाला? या डावपेचांमुळे मुंबईच्या धूर्त व धाडसी पोलीस अधिकाऱ्यांनीं आतांपर्यंत केलेल्या श्रमांवर निष्कारण काळिमा फासला जात आहे. इतकेंच नव्हे तर त्यांनी चोर सोडून संन्याशांना फासावर लटकविण्याचा घोर अपराध केला आहे. असा अप्रत्यक्ष आरोप त्यांच्यावर सिद्ध होऊ पहात आहे. याबद्दल योग्य त्यारीतीनें आपला निषेध व्यक्त करण्यास तें खातें खंबीर आहे.
ह्या बाबतींत संस्थानद्वेष्ट्या भिक्षुकी पत्रकारांनी, हिंदुद्वेष्ट्या इस्लामी पत्रकारांनी आणि टाइम्ससारख्या हिंदुद्वेष्ट्या आंग्रेजी पत्रांनी लोकमत इतकें बेफाम भडकविलें आहे कीं आज त्याला विवेकाचा काहीं बंधच ठरलेला नाहीं. जागृतिकार म्हणतात त्याप्रमाणें हे लोकमत नसून लोकमताचा उकिरडा आहे. ह्या उकिरड्याला फुंकण्याइतका गाढवपणा करणारे कोण सज्जन पुढें येतात तेंच पाहणें आहे. ज्यांची विवेकाची दृष्टीच फुटली, त्यांना सारासार तारतम्य विचार तरी कसचा सुचणार? स्वराज्याच्या नांवाखाली देशांत जो भयंकर सावळागोंधळ राजकारणी पुढाऱ्यांनी माजविला आहे, त्याची फलश्रुति सध्या एवढींच दिसतें का देशात एक प्रकारचा खुनशीपणा मात्र बेफाम बोकाळला आहे. इंग्रजी सत्तेच्या नरडीचा घोट घ्यायला जरी आज सापडला नाही, तरी कोणाच्या तरी नरडीचा चावा घेतल्याशिवाय त्या खुनशी प्रवृत्तीचें समाधान होणार नाहीं. डोळ्यांवर खून चढलेला मनुष्य आपपर भेदाला पूर्ण पारखा होतो. तीच रुधिरलालसा भिक्षुकीपत्रांनीं प्रस्तुत प्रकरणांत उत्पन्न केलेली आहे.
ब्रिटिश सत्तेच्या सिंहासनाच्या ठिकऱ्या होतील तेव्हां होतील; पण सध्या एका देशी संस्थानाचें वाटोळे करण्याची खरीखोटी कच्चीपक्की संधी आली आहे, ती तरी कां हातची दवडा? ह्यापेक्षा सध्याच्या लोकमताचें आणखी निराळें स्वरूप काय आहे? ह्या असल्या खुनशी लोकमतानें पाघळण्याइतकें ब्रिटिश सरकार आजच इतकें नादान बनले असेल असे आम्हांला वाटत नाहीं. एका उलट्या काळजाच्या छिनाल रांडरू पार्थी एका विषयलंपट खुशालचेंडूचा खून होतो काय आणि त्यासाठी गुन्हेगार लोकांची सर्व तपासणी सुनावणी शिक्षा वगैरे पद्धतशीर कायद्यानें होऊन, पुन्हां इंदोराधिपतीलाहि तोफेच्या तोंडी दिल्याशिवाय आमच्या जिवाची तळमळ शांत होणार नाही, असा लोकमताचा रंग भिक्षुकीपत्रे व्यक्त करतात काय, ह्याची वास्तविक लोकांनाच चिळस आली पाहिजे, वाटेल त्या खोडसाळ भावनांचा रंग चोपडून लोकमत जर असें बेजबाबदार रीतीनें व्यक्त होऊ लागेल, अगर कोणी तें तसें करण्याचा धाडसी यत्न करील, तर त्याचा वेळींच बंदोबस्त लोकांनींच न केला तर लोकमत म्हणजे वाटेल त्या कटवाल्यांचे एक मोफत मिळणारें भांडवल होऊन बसेल, याची विवेकी सज्जनांनी वेळींच दक्षता ठेवावी, अशी प्रार्थना आहे.
विवेकानें सर्व स्थिती पहा
खुनशी मनोवृत्तीचें क्षेत्र सोडून शांतपणानें व विवेकानें सर्व स्थिति पाहिली तरी काय निष्कर्ष निघतो, तो पाहिला पाहिजे. खून होतांच मुंबई पोलीस खात्याने झटपट सर्व धागेदोरे जमवून इंदोरकडे मोर्चा वळविण्यासाठी पकड वॉरंटे मिळविली. इंदोर संस्थान हें ब्रिटिशांचे दोस्तराष्ट्र आहे. त्या राष्ट्राधिपतीची परवानगी मिळाल्याशिवाय मुंबई पोलिसाला तेथें पाऊलहि टाकतां येणार नाहीं. न्यायाला मदत व्हावी म्हणून एकमेकांच्या हद्दींतील आरोपी एकमेकांस द्यावें असे परस्पर करारमदार झालेले असले, तरी पुढें केलेल्या (prima facie) पुराव्यावरून अमुक एक आरोपीवर गुन्हा शाबीत होऊं शकतो की नाहीं हे ठरविण्याचें काम त्या राष्ट्रांतल्या मॅजिस्ट्रेटाचे व अधिपतीचें आहे; आणि त्यांच्या मतानें आरोप सिद्ध होण्याइतका पुरावा नसेल तर आरोपीला ब्रिटिश पोलिसांच्या हवाली करणे किंवा साफ नाकारणें त्या राजाच्या खुशीवर असते. आरोपींना पकडण्यासाठी सुटलेलीं एक्स्ट्राडिशन वॉरंटें म्हणजे इंग्रजांकडून होळकर सरकारच्या मानेला लावलेला जरबेचा चाप, अशी कोणाची समजूत असेल तर ती चुकीची आहे. होळकरांना वाटलें असतें तर ही वारंटें गेली तशीं फेटाळून लावणें त्यांना मुळींच कठीण नव्हतें. गोवा पाँडेचेरीसारख्या प्रदेशांत किंवा संस्थांनी हद्दींत आरोपी आश्रयाला पळून जातात ते याच आधारावर. की वेळ आली तर तेथे काहीतरी धडपड करून ब्रिटिश हद्दींतील वॉरंटें फेटाळून लावता येतात; निदान तहनाम्याच्या अटींचा कीस काढीत महिना दोन महिनें सहज डांगळत ठेवतां येतात. संस्थांनी हद्दींत ब्रिटिशांचा वाटेल तो उघड किंवा गुप्त पोलीस बिगर परवानगी जाऊन वाटेल त्याला पकडूं म्हणेल किंवा वाटेल त्याची झडती घेऊं म्हणेल तर तें शक्यच नाही. मग इंदोरासच है `आव जाव घर तुम्हारा` काय म्हणून? हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचाच विवेकानें नीट विचार केला पाहिजे.
मुंबईची पकड वॉरंटे घेऊन पोलीस इंदोरास जातांच महाराजांनी ताबडतोब त्यांना वाटेल ती चौकशी करण्याची सर्रास परवानगी दिली. आरोपी असतील त्यांना पकडा आणि चालते व्हा. असाहि निर्बंध त्यांनी घातला नाहीं. ओळख पटविण्यासाठी ले. सीर्गाटला पोलिसनें नेलें तेव्हांहि शहरभर वाटेल तेथें फिरण्याची व वाटेल त्याविषयीं विचारपूस करण्याची त्यांना सवलत दिली. आपले सीऐडीलोक, इन्स्पेक्टर जनरल व मोटारी त्यांच्या मदतीला दिल्या.
इतकेच नव्हे, तर अॅडज्युटंट जनरल फणसे ह्या पोलिसांना तीन दिवस सांपडले नाहींत; तेव्हा खुद्द महाराजांनी शोधून काढून त्याला पकडून स्वतः मुंबई पोलिसांच्या हवाली केलें. महाराजांच्या बेजबाबदार टीकाकारांना फणसें किंवा दिघे ह्यांची आज कांहीं किंमत वाटत नसली, तरी फणसें ॲडज्युटंट जनरल व दिघे कॅप्टन एअर फोर्स असे मोठे जबाबदार अधिकारी होते. जे होळकर महाराज मुंबई सरकारची मागणी होतांच असले मोठमोठे जबाबदार जागेवरील अधिकारी आपण होऊन बिनतक्रार मुंबई पोलिसांच्या हवाली करतात, ते न्यायाला मदत व्हावी म्हणून, का खुनाच्या कटाचे आद्यप्रवर्तक म्हणून? याचा विवेकानेंच विचार केला पाहिजे.
महाराजांवर शिखंडीपणानें खुनाचा आरोप लादूं पाहाणाऱ्या शहाण्यांनी ह्या त्यांच्या वर्तनाचा विचार केला तर भिक्षुकी व कारस्थानी पत्रांनीं त्यांच्या मनांत कालविलेला खुनशीपणाचा अंमल खास कमी झाल्याशिवाय राहणार नाही. आजहि मुंबई पोलिसाला इंदोरचे दरवाजे सताड मोकळे ठेवलेले आहेत. `या, वाटेल तो तपास वाटेल तसा करा आणि जा.` आम्हांला असें वाटतें कीं न्यायाच्या बाबतींत इतकी मुबलक सवलत व इतकी खास मदत देशी संस्थानिकांकडून मिळाल्याचें हें पहिलेंच उदाहरण आहे. आपल्या राज्यांतील अपराध्यांना फांशींची शिक्षा ठोठावण्याचाहि ज्यांचा अधिकार, त्या होळकर महाराजांवर एका क्षुद्र इसमाच्या खुनाचा आरोप करणारांनी आपले विचारयंत्र कोणत्या विकारांनी गंजड बनले आहे, याचा नीट तपास करून घ्यावा, यापेक्षां बेजबाबदार खुनशी प्रवृत्तीची आणखी कोणत्या सौम्य शब्दांत प्रार्थना करावयाची?
कटवाल्यांचें स्मारक तरी करा
बावला खुनाच्या पराचा कावळा करून होळकर सरकारच्या रक्तानें आपली राजक्रांतीचीं रुधिरलालसा शांत करूं इच्छिणाऱ्यांना आणि `बावलायन` रचून रामायणाची किंमत फाटक्या पायतणाची ठरविणाऱ्या बुद्धिभ्रष्टांना आमचा एकच सवाल आहे. डोकेबाज, (clear headed) महामाया मुमताज, नऊ आरोपी, गाडाभर साक्षीदार, अॅडव्होकेट जनरल किंवा न्यायमूर्ती यांपैकी एकानेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, हळू किंवा मोठ्यानें, जिभघसरींने किंवा नारोशंकरी घंटानादानें `मुमताज ही महाराजांची रखेली होती` यापलीकडे अधिक कोणताही संदर्भ महाराजांविषयी केव्हांही व्यक्त केलेला नाही. खुद्द फणसे म्हणतो कीं, `मी हा सर्व व्यूह माझा मित्र जो शंकरराव गावडे, त्याच्या हितासाठी व माझ्या भाग्योदयासाठी रचला.` तोहि महाराजांचे नावं घेत नाही.
किंवा त्यांचा कसलाहि संबंध दर्शवीत नाही. आज ह्या सर्व आरोपींच्या माना फासावर लटकल्या आहेत. काळ त्यांच्यापुढें आ पसरून उभा आहे. त्यांच्या सर्व आयुष्याची, महत्त्वाकांक्षांची व संसाराची आज राखरांगोळी झाली आहे. मृत्यूच्या दाढेंत मान अटकली असतांहि ते अजून महाराजांचा कोणत्याहि रीतीने नामनिर्देश करीत नाहींत. त्यांच्या दयेच्या अर्जालाहि (भिक्षुकी पत्रांच्या निर्दय भाषेत बोलायचें तर) `वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या.` आम्ही सर्व महाराजांच्या प्रेरणेनें किंवा त्यांच्यासाठी केलें, असा अस्पष्ट जरी एखादा सूर त्यांच्या दयेच्या अर्जांत निघतां तरी त्यांच्या फासावरच्या माना सुटण्यास पुष्कळच आशा होती. पण तेंहि त्यांनीं केलें नाहीं. महाराजांची या दुष्कृत्याला कांही सूचना, प्रेरणा, प्रत्यक्षाप्रत्यक्ष मदत, चिथावणी किंवा निदान मूक संमति होती, असें गृहीत धरलें तर आरोपींच्या या वर्तनाची वासलाद कशी लावता येणार?
याला एकच मार्ग आहे. एकतर हे खुनी आरोपी कट्टे राजनिष्ठ स्वार्थत्यागी (martyrs) तरी असावे किंवा भिक्षुकी पत्रकारांचा महाराजांवरील खुनाचा आरोप शुद्ध बेजबाबदार पाजीपणाचा आणि जाणूनबुजून केलेल्या बदनामीचा असावा; यापैकी कोणता तरी एक मार्ग होळकरांच्या दुष्मनांनी पत्करल्याशिवाय गत्यंतरच नाही. आपल्या मालकाच्या नावांसाठी जान देण्यास तयार झालेल्या नेताजी पालकर, धनाजी जाधव, संताजी घोरपडे, खंडो बल्लाळ, बाजीप्रभु देशपांडे ह्या ऐतिहासिक स्वार्थत्याग्यांच्या पंक्तीला ही खुनी कटांतली मंडळी martyrs म्हणून बसविण्यास `बावलायन` वाले भिक्षुक व हिंदूद्वेष्टें आंग्लपत्रकार तयार आहेत काय? असल्यास त्यांनीं त्यांचे एक मोठे देऊळ, मशीद किंवा चर्च क्रॉनिकल किंवा टाइम्स ऑफिसानजीक उभारण्याचा फंडगुंडी स्मारकयत्न करून बावलाघातकी देवांचे बडवे बनावे, अथवा होळकर महाराजांच्या निष्कारण बदनामीबद्दल बिनशर्त माफी मागावी. या दोहोंपैकी कोणता मार्ग हे शहाणे पत्करतात तेवढें लवकरच दिसून येईल.
केवढी ही सत्यशोधनाची निष्ठा!
टाइम्स, क्रॉनिकल, डेली मेल वगैरे पत्रे लोकमत निदर्शक म्हणून समजण्याचा एक आंधळा संप्रदाय आहे. साधारण बहुजनसमाजाला ही पत्रे म्हणजे मोठी देवबाप्पा वाटतात. ह्या पत्रांत प्रत्येक गोष्टीच्या दोन्ही बाजू प्रांजलपणे मांडल्या जातात, असा लोकांत एक (गैर) समज आहे. खरी वस्तुस्थिती फार निराळी आहे. इतर धांदोट्या चिंधोट्याप्रमाणेंच ही बडी धेंडे आपल्या ठराविक धोरणाविरुद्ध मतांची गळचेपी करण्याचें मुर्दाड काम करीत असतात. त्या कामीं `असोशिएटेड प्रेस` ही बातम्या पुरविणारी प्रतिष्ठित संस्थासुद्धा वारंवार भिक्षुकी वळणाचे फेफरें आणतें. बावला प्रकरणावर ह्या तीनहि पत्रांतली विधानें, बातम्या व इतर पत्रव्यवहार ह्यांचा खोडसाळपणा दाखविणारी इंदोरस्थ अनेक जबाबदार व प्रतिष्ठित नागरिकांची पत्रे त्यांनीं न छापतां धुडकावून दिल्याचें आम्हांस समजतें.
खुद्द आमच्याहि दोन पत्रांना त्यांनी दिलगिरींचे लिंबलोण लावून परत केलीं. हा सर्व मुस्कटदाबीचा प्रकार पाहिला की, या पत्रांचा एका विशिष्ट धोरणानें कांहीं ठराविक उद्देश साधण्याचा गुप्त कटच झाला आहे कीं काय असें मानणें प्राप्त पडतें. सत्यशोधनाची, न्यायप्रियतेची आणि कोणत्याहि एका पक्षाचा पक्षपात न करणाऱ्या निःस्पृहतेची या पत्रकाराची मिजास किती खोटी व दांभिक आहे, हें ह्या त्यांच्या अरेरावी वर्तनांवरून सहज दिसून येईल. विचार प्रकटीकरणाच्या मार्गांत आपल्या एडिटरकीच्या अधिकाराची धोंड टाकून विवक्षित उद्देशाचाच टेंभा मिरविणारे हे पत्रकार लोकशाहीचें प्रवर्तक का झब्बुशाहीचे मुर्दाड कटवाले, याचा विवेकी सज्जनांनीच विचार करावा.
मुमताझ प्रकरणांत या दीर्घशहाण्यांना सत्यशोधनाचा जर इतका धोसरा लागलेला आहे, तर दोन्ही बाजूंचे स्पष्ट विचार आपल्या पत्रांत प्रसिद्ध करतांना त्यांची निःस्पृहता व सत्यप्रियता बिनचूक कशी व्यभिचारी बनते? सारांश, होळकरांची होळी करूं पहाणाऱ्या सर्व इंग्रजी मराठी पत्रकारांचें खाक्याचे व दाखवायाचे दात अगदी वेगवेगळे आहेत; आणि बाह्यात्कारीं जरी तीं राजकारणी भुसाड गोष्टींच्या वादांत निरनिराळ्या पक्षभेदाची मुखपत्रे शेपुटपत्रे दिसतात, तरी असल्या प्रसंगी ते सर्व एकजिनसी उद्देशाचे जानीदोस्त कटवाले बनतात, हेंच स्पष्ट सिद्ध होतें.
देशी संस्थानाधिपतींची मुस्कटदाबी
खालसांतल्या पत्रकारांनीं वाटेंल तितकी बीभत्स निर्भत्सना केली तरी हे राजे स्वस्थ का बसतात? आज होळकर सरकारांविषयीं उघड काढलीं जाणारी घाणेरडी बेअब्रूकारक व अपमानपूर्ण लेख व चित्रे, खालसांतल्या एखाद्या आडूमाडू मामलतदाराविषयीं जर असती, तर त्या पत्रकाराला कायद्याच्या घरटांत दळून त्यांचें पीठ पाडायला त्या रावसाहेबाला चोवीस तासांचासुद्धां अवधी लागला नसता. मग हे स्वयंनिर्णय सत्ताधीश राजे लोकच मूग गिळून स्वस्थ कसे बसतात? तेव्हां येथेंच कांहींतरीं पाणी मुरत असलें पाहिजें खास असें पुष्कळांना वाटत असेलं. पण खरी वस्तुस्थिति काय आहे? फ्रेंच किंवा जर्मन राष्ट्राच्या प्रेसिडेंटावर मनमुराद तोंडसुख घेणाऱ्या हिंदी पत्रकाराला ब्रिटिश रियासतीत जितका आडोसा सांपडतो, आणि तो प्रेसिडेंट एक तर त्या शिवराळाला शुद्र समजून जितका कानाडोळा करतो किंवा आंतरराष्ट्रीय करारमदारांच्या भानगडी एवढ्या क्षुद्र कारणावरून कोणी उपस्थित कराव्या म्हणून नाइलाजानें स्वस्थ बसतो, तितकाच कोंडमारा या राजेलोकांना सहन करावा लागतो.
प्रश्न परहद्दींतील शिवराळांचा पडतो. स्वतःच्या हद्दींतील प्रश्न असता, तर असल्या बेजबाबदार कलमकसायांना जबाबदारीचें शिक्षण देण्यापुरतें संस्थानी कायदे, त्यांची न्यायकोर्ट व अखेर तेथलीं `स्वराज्यमंदीरें` खंबीर आहेत. इतकेंच नव्हे तर संस्थानिकांच्या ब्रिटिश दोस्तांच्या गलधटपणाचा पूर्ण फायदा घेत खालसाच्या कुंपणाआड लपून, संस्थानिकांवर मनमुराद भुंकणारी कुत्रीं संस्थानी हद्दींत कधी काळी सापडलीच तर त्यांना त्यांच्या कृतकर्माचे प्रायश्चित देण्याइतका संस्थानिकांचा कायदा व अधिकार खास समर्थ आहे. १८९६ सालच्या होळकर प्रकरणांतील भिक्षुकी पत्रकारांच्या शिमग्यांविषयी कै. धनुर्धारी यांनी केलेला खुलासा बाचला म्हणजे निंदकांच्या जिभेला कोलदांडे घालण्याच्या कामी संस्थानिकांच्या मार्गात किती अडचणी असतात हे नीट लक्षांत येईल.
"आतां ज्यांच्या अब्रूवर हल्ला होत आहे त्यांनी काय म्हणून स्वस्थ बसावें हा प्रश्न आहे. पण त्यांनीं तरी करावें काय? मराठी पत्रें आणि त्यांचे ओरडणे यांची आधी कोणी पर्वा बाळगीत नाही. मराठी पत्रकर्त्यांचा आवाज अद्याप फार कोता आहे आणि कुवतहि फार कच्ची आहे, ही गोष्ट नाइलाजानें आपली आपण बोलून दाखवावी लागते. आणखी दुसरी अशी गोष्ट आहे कीं, निर्देचे चालू असलेलें यंत्र इंग्रजांच्या मुलखांत, तेथे कायदेशीरपणानें इलाज योजूं जाणें अनेक कारणांमुळे अगदी निरुपयोगी. अब्रू साफ करून घ्यावयास स्वतंत्र व दोस्त सरकारपणाची योग्यता अंगी असणाराने साधारण कोटांत फिर्यादी होऊन जायें ही कल्पना तरी रास्त होईल काय?
दोस्त सार्वभौमाकडे जायें तर कायदेशीर रस्ता आणि पिनलकोडाकडे बोट यांहून जास्त काय मिळणार आहे? फौजदारी गुन्ह्यांत फिर्याद मुखत्यारामार्फत चालत नसते. तेव्हां आमचें कायदेशीर खंडण करा, आमची तयारी आहे, या म्हणण्यांत कितपत अर्थ आहे, हें उघडच दिसतें. आश्रितादि मंडळीनें लेखनद्वारा खंडण करून दुसरी बाजू पुढें आणिली तर त्यांचे म्हणणे जमेस धरण्याला सकृद्दर्शनींच अडचण पुढें येऊन शिवाय अनेक अन्य कारणांमुळे तसे करण्यांत अर्थ नाहींसा होतो. म्हणून तिकडूनहि अडचण. तेव्हां खरी बाजू पुढे यावी कशी? आणि भरधाव पुढे पळत सुटलेल्या साप्ताहिक निंदेचें खंडणं व्हावें कसें? आणि ते झालें नाहीं म्हणून पुढें येत आहे ती निंदा खरी असें धरून चालणें शहाणपणा आहे काय? ह्याचा ज्याचा त्यानेंच आपणाशीं विचार करून पहावा. सांगण्याचा मुद्दा एवढाच कीं दुसरी बाजू आजवर पुढें आली नाहीं, किंवा एकच बाजू पुढे येते, तिचें कायदेशीर किंवा लेखनद्वारा खंडण होत नाहीं म्हणून ती बाजू खरी असावी असें समजणें केवळं चुकीचें आहे. पुढें आलेल्या एकतर्फी निंदेचें खंडण करण्याच्या काम वर सांगितलेलें व इतर अनेक अडथळें आहेत. अशा परिस्थितींत आपलीं निंदक लेखणी मनमुराद `निर्वीर्यमुर्वीतलम्` म्हणून सारखी भरकटत सोडावयास चांगलें फावतें. पण तेवढ्यावरून ती बहकतें तें सर्व खरें असें मानतां कामा नये."
मूल मेलें का मारलें?
विषयलंपटपणाला बळी पडलेल्या बावलासारख्या एका क्षुद्र व्यक्तीला देवकळा देण्यासाठी `बावलायन` रचणाऱ्या क्षुद्रांनी महामाया मुमताझला देवता जगदंबा किंवा प्रत्यक्ष आपली आई मानून तिचेंहि देव्हारे माजविले नसते, तरच तें मोठें आश्चर्य झालें असतें. या देव्हारे माजविण्याच्या थेरांत मुमताझच्या पोर्टी जन्मलेल्या गर्भमृत (Still-born) मुलीचें एक मोठे नाजूक कलम घुसडून त्यावर भावनाप्रधान नाजूक लेखांचा व काव्यांचा स्तुतिपाठकांनी मोठा खच पाडला आहे. महामाया म्हणते, "माझें बाळ जन्मल्यावर मेलें असें मला सांगण्यांत आलें." ते मेलें किंवा अर्धमेल्या स्थितींतच जन्मलें, तेव्हां तें काय जिवंत आहे म्हणून तिला सांगायचे? "मूल मेल्यामुळे मला इंदोरचा तिटकारा येऊ लागला." शक्य आहे. आईचेंच आंतडें तें! पण इंदोरास राहून आणखी मुलें झाली नसती कशावरून? त्यासाठी तिटकाऱ्याचा त्रागा करून मुंबईच्या गांवभवान्यांची पागा बसविण्याचीच कांही जरूर नव्हती!
मुमताझचे अनन्य भक्त असे लोकांना भासवीत आहेत की, हें पोर महाराजांनी ठार मारविलें. सुटका करणारी लेडी डॉक्टर व नर्सेस म्हणतात की, मूल अर्धमेल्या अवस्थेत जन्मले व ताबडतोब मेलें. मुमताझभक्त म्हणतात, महाराजांनीं मारविलें. मुमताझला मुलगी झाली होती. आम्ही म्हणतो की, मुलगा झाला असेंच गृहीत धरले तरी त्यामुळे महाराजांवर व इंदोरच्या गादीवर त्यामुळे अशी काय मोठी आपत्ती गुदरणार होती कीं त्यासाठी महाराजांनी त्या बालकाचा जन्मतांच जीव घ्यावा? मुमताझच्या पोटीं संततीच होऊ नये अशी जर महाराजांची इच्छा असती तर तसा शास्त्रीय किंवा औषधीय बंदोबस्त आगाऊच करायला त्यांना कोणती अडचण पडती?
तोंडातून शब्द निघायचा अवकाश तर ती व्यवस्था करायला अत्युच्च पदवीधर व पटाईत शस्त्रज्ञ सर्जन व डॉक्टर काय त्यांच्या दिमतीला हजर नव्हते? बरें ती मुलगी किंवा मुलगा जगलाच असता तर तो काय युबराजाविरुद्ध होळकरांच्या गादीचा वारसा भांडत बसता? मुलगा जगला तर रक्षापुत्र म्हणून मानांत रहाता. काय असे कोणी कर्तबगार रक्षापुत्र देशी राज्यांत कोठेंच नाहींत? का त्यांचा तेथें कांहीं मान नाहीं? का त्यांना जहागिरी नाहीत? आणि ही तर होती मुलगी तिला मारण्यांत महाराजांना काय मिळाले? का ती राज्यावर हक्क सांगणार होती? का तिला पोसायचे महाराजांना सामर्थ्य नव्हतें? महाराजद्वेष्टे लोक काय कारण समर्थनार्थ देतात? रखेलीलासुद्धां राणी बनवून तिच्या पोटच्या मुलाला राज्याचा वारस ठरविण्याच्या खटपटी करणारी एकदोन संस्थानें जेथें आज प्रत्यक्ष अस्तित्वांत आहेत, तेथे मुमताझच्या मुलीची हत्या करण्यांत महाराजांना काय मिळवायचें होतें, याची विनंती मान्य कारणमीमांसा निंदकांनी पुढे मांडली तर मान्य होईल. तोपर्यंत असल्या बेजबाबदार आरोप बरळणं शूद्रांच्या विचारक्षुद्रतेची कींव करण्यापेक्षां अधिक काय करतां येईल! प्रस्तुतच्या मुमताझ प्रकरणामुळे एक फायदा असा झाला आहे की देशभक्तीच्या पांघरुणासाठी वर्तमानपत्राचा प्रतिष्ठित धंदा करणाऱ्यांत साव आणि बेरड चोर किती याचा अंदाज करतां येणें अशक्य झाले आहे.
एवढा पैसा कुठून आला?
इंदोराधिपती होळकर सरकारच्या रक्तासाठी तान्हेल्या भिक्षुकी व हिंदुद्वेष्ट्या आंग्रेजी पत्रकारांना आतां एक असा जिव्हाळ्याचा पेंच येऊन पडला आहे कीं मुमताझ कटामधील आरोपींनी डिफेन्सची कायदेबाजी लढवायला एवढा पैसा आणला कुठून? जणू काय हा प्रश्न जर नीट सुटला नाहीं तर या प्रभृती पत्रकारांच्या सत्यान्वेषणी अकलेवर वैधव्याचा डोंगर कोसळणार आहे. यदाकदाचित आरोपी तर नुसते खाका वर करून कोटांत उभे राहाते, तर हे आंग्रेजी व भिक्षुकी पत्रकार आपापली घरेंदारें गहाण ठेवून त्यांच्या बचावलेल्या पैशाच्या थैल्या घेऊन धांवले असते, असे मात्र कोणी समजू नये.
शंका एवढीच येतें कीं बॉम्बे क्रॉनिकलवर धारवाड बाराच्या बाबतीत पेंटर कलेक्टरने बेअब्रूची फिर्याद लावली त्या कज्जेदलालीला लागणारा खर्च झेपण्याइतकी कलेक्टराची सांपत्तिक स्थिती वास्तविक असते काय? आणि जर नसते, तर तो खर्च पेंटर साहेबांना कसा झेपला? कोठून आला एवढा पैसा? हे प्रश्न विचारण्याची त्या वेळीं एका तरी आंग्रेजी व भिक्षुकी पत्रकारांची छाती झाली काय? फंडगुंडांची बंडे अखंड चालवून त्यावर आपला तळीराम थंडगार करणाऱ्या कांहीं लुच्च्या भिक्षुकी पत्रांनीहि याबाबतींत मोठ्या सत्यशोधनाचा डौल मिरबाबा, ही मोठी बेशरमपणाची गोष्ट आहे. टाइम्स क्रॉनिकल डेलीमेल प्रभृतींचे काय!
हिंदवी हितवादाचा त्यांचा पारदर्शक मुखवटा उचलून फेकून दिला तर त्यांना बारसें बाराव्याचा आनंद सारखाच, इतकें त्यांचें काळीज निगर्गट्ट आहे. फंडगुंडी भटुरडे काय किंवा हे पाटलोणे सोदे काय, जरा कोठें चोंच मारायला जागा सांपडलीं कीं हीं गिधाडे साध्या पुळींचेंहि माकडखांडुक बनवायला कमी करायची नाहीत. श्रीमन्महाराज तुकोजीराव होळकर यांना खुनाच्या खटल्यांत कसेंहि करून गोंवण्याचा हा जो वर्तमानपत्री गुप्त कर आस्ते आस्ते प्रकट होत आहे, त्याचा हा पैशाच्या संबधीचा एक फासा आहे. हे चाणाक्ष वाचकांना समजण्यास फारसे आयास पडणार नाहींत. या कटवाल्यांना एवढेचं सिद्ध करावयाची विवंचना लागली आहे कीं हा पाण्यासारखा पैसा होळकरांच्या तिजोरींतून आला, तरी वस्तुस्थिति बाजूला ठेवून आपण क्षणभर असेंही गृहीत धरून चालूं कीं होय, होळकर सरकारनींच आरोपींच्या बचावासाठी आपली तिजोरी मुक्तद्वार फोंडली.
यांत अन्याय काय झाला? खुनाची तरफदारी कशी सिद्ध होते? आणि बिघडलें तें काय? आरोपींच्या बचावासाठी तनमनधनाचा व्यय करणारे नातेवाईक, मित्र, मालक किंवा कारखानदार हेहि आरोपींच्या गुन्ह्याचे साथीदार ठरतात, असा कायदा पेशवाईत कदाचित् असेल, पण ब्रिटिश रियासतीत असल्याचें मात्र आम्हाला माहीत नाही, टिळकांविरुद्ध चिरोल खटल्यांत मुंबई सरकारनें चिरोलच्या बचावासाठी काय परिश्रम व किती पैसा खर्च केला, याचा हिशेब टाइम्सनें कधीं विचारला होता काय? या खटल्यांतील चिरोलच्या बचावाच्या तपशिलाचा अभ्यास केला तर असें स्पष्ट म्हणावें लागतें कीं, मुंबई सरकारच्या सिऐडी खात्याची व इतर खात्यांची चिरोलला जर खास मदत नसती तर तो खटला जिंकायची त्याची काय माय व्याली होती? मुंबई सरकारचा चिरोल कोण? काय गव्हर्नर, का जावई, का मानसपुत्र? मग त्याला ही एवढी खास बचावाची मदत काय म्हणून? असा प्रश्न विचारतांना ज्यांच्या दांतखिळ्याच बसल्या, त्यांनीं मुमताझ कटांतल्या आरोपींच्या `पाण्यासारख्या पैशां नें बिचकून जाण्याचें वास्तविक काहीं कारण नाहीं.
प्रस्तुत खटल्यांतलें तिघे आरोपी इंदोर संस्थानांतले मोठे अधिकारी आहेत. त्यांनीं करूं नये ती गोष्ट केली खरी; परंतु सरकार ह्या नात्यानें त्यांना बचावासाठीं शक्य ती मदत इंदोर सरकारनें वास्तविक द्यावयास पाहिजे होती. एवढेच नव्हें तर हा खुनाचा खटला इंदोरच्याच सेशन कोर्टात आम्ही चालवितो असा हट्ट त्यांनीं धरावयास पाहिजे होता. तें काहींचं न करतां आपले मोठमोठे अधिकारी मागणी होतांच ब्रिटिश दोस्त सरकारच्या हवालीं करून आपण नुसते टाइम्स क्रॉनिकल वाचीत बसण्यांत होळकर सरकारनीं आपल्या कर्तव्याला पाठ दाखवून गाळीव मूर्खपणा केला, असें आमचें मत आहे.
ब्रिटिश साम्राज्याच्या इज्जतीसाठी चिरोलसारख्या एका इंग्रजी पत्राच्या बड्या रिपोर्टरासाठीं बचावाचा त्रिखंड आटारेटा करणारे मुंबई सरकार कोणीकडे आणि अॅडज्युटंट जनरल, कॅप्टन एअर फोर्स व मानकरी यांसारख्या संस्थानच्या वड्या अधिकाऱ्यांना बिनतक्रार मुंबई सरकारच्या ताब्यांत देऊन `मी न्यायाला मदत केली` म्हणून अभिमान वाहाणारे इंदोराधिपती कोणीकडे सरकार, आपण न्यायाला काटेकोर मदत केली खरी, पण व्यवहाराला पारखे होऊन आपल्या पदरच्या आश्रितांना ऐन प्रसंगी बचावासाठी काडीचीहि मदत केली नाहीत, या सेवकद्रोहाचा वाटा तुम्हाला गुपचूप पदरांत घेणेंच भाग आहे. उघड उघड दिसणाऱ्या गुन्ह्यांत एखादा मित्र सांपडला तरी त्याच्याहि कायदेशीर बचावासाठी आपण पदरमोड करून उघडउघड खटपटी करतो. कायदेबाजी लढवतो. कज्जेदलालांची घरें भरतो आणि कसेही करून त्या मित्राला वाचविण्याचा यत्न करतो. त्यामुळें त्या गुन्ह्यांत आपण प्रत्यक्ष सामील आहों, असें थोडेंच होतें? खुनी इसमाला बॅरिस्टर देतां आला नाहीं तर इंग्रेजी कोर्टात सरकारतर्फे त्याला बचावाची सर्व तरतूद मोफत करून देण्यांत येत असते. सारांश, कटवाल्यांना होळकरांनी बचावाची लागेल ती मदत दिली असती, तरच ती गोष्ट त्यांना अधिक शोभली असती; पण तें त्यांनीं केलें नाहीं ही मोठी चूक झाली.
पण ज्याच्या सुटकेसाठीं मुमताझ कट अस्तित्वांत आला तो शंकरराव गावडे किंवा फणसे दोघेहि मोठे धोरणी. त्यांनी प्रथमपासूनच महाराजांची पर्वा केली नाहीं. दोघेहीं घरचे श्रीमंत. फणसे जमीनदार, तर शंकरराव गावडे पैशाची भयंकर अफरातफर केली म्हणूनच तुरुंगांत गेलेला. अशा अवस्थेत महाराजांच्या कवडीची फणसे आशा तरी कशाला करतो! जेथे सगळेच कटच गुप्त, तेथें त्याची वाच्यता महाराजांना कां कळावी? आणि कळविण्याइतका फणसे मूर्ख असता तर गुप्त कट कशाला करता या पाण्यासारख्या पैशाबद्दल इं. डें. मेल पत्रांत आरएनपी गुफेल यांनी केलेला खुलासा समाधानकारक आहे. श्री. गुफले म्हणतात:-
"Mr. Phanse is a Zemindar and Shankar Rao is Suppered to have secreted a large amount of money. For Shankar Rao`s friend oat get money is easier than it is for even the Government with the highly elaborate checks and balances of the Finance Department. The wonder is not that Phanse had so much money, but that he and his friends lacked `brain power` as otherwise they would not have so oftenly associated themselves with the plot or made the attempt in so prominent a place. This alone would suffice to disarm any suspicions about the identity of the `prime mover` if proofs were needed. But it is useless to argue, when newspapers take advantage of the relatives gullibility of the Indian Public for propagating confusions drawn long before the police had any evidence and the trial in the two Courts."
(भावार्थ :- फणसे जमीनदार आहे आणि शंकररावने तर पैशावर यथास्थित गुप्त हात मारल्याचे सर्वश्रुतच आहे. खुद्द सरकारला रकमा पाहिजे असतील तर तिजोरी खात्याच्या आढाव्या वाढाव्याच्या त्रांगड्यांतून पद्धतशीर कवायतींने जावें लागते. पण फणशाची स्थिति तशी नाहीं. त्याला केव्हांहि पैसें मिळणे कठीण नव्हतें. फणशाजवळ एवढा पैसा कोठून आला या प्रश्नांत काहींचं अर्थ नाही. त्यांत कांहीं नवल नाहीं, पण त्याच्यासारख्या माणसानें असल्या कटांत उघड भाग घेऊन मुंबईसारख्या शहरांत त्याचा धाडसीं यत्न करावा, या त्याच्या महामूर्खपणाचेंच वास्तविक विशेष आश्चर्य वाटलें पाहिजे. या एकाच गोष्टीवरून कटाच्या मुख्य चालनेविषयीं कोणाला जबाबदार धरावें या शंकेचें समाधान होतें. पण याबाबतींत विधान करायला वर्तमानपत्री गाजावाजानें कांही जागाच ठेवलेली नाहीं. पोलिसांनी पुरावा गोळा करण्यापूर्वीच व दोनही कोटांत खटला चालण्यापूर्वीच जीं पत्रें हिंदी लोकांच्या भोळ्या मनोवृत्तीचा फायदा घेऊन याबाबतींत बेछूट विधानें ठोकून मोकळी होतात, त्यांच्यांशी हुज्जत घालीत कोण बसतो!)
जुन्या होळकरांचा राजीनामा
(हें पत्र मुंबईचे विविधवृत्तकर्ते यांनी `या जुन्या गोष्टींना महत्त्व नाहीं` या शेऱ्यानें परत केलें. जुन्या गोष्टीला महत्त्व नव्हतें, तर त्या बाबत मूळचा विपर्यासी लेख तरी त्यांनी कशाला छापला? सध्यांचे होळकर प्रकरण जुन्या प्रकरणाचीच सुधारित वाढविलेली नवी आवृत्ती आहे व जुन्या कटवाल्यांचीच कारस्थाने सध्यां चालू झाली आहेत, हैं क्रमशः सिद्ध होण्यास फारसा अवधी नाहीं. सं. प्र.)
रा. रा. `विविधवृत्त`कर्ते यांस
आपल्या ७-६ह्र२५च्या अंकांत `जुन्या होळकरांचा राजीनामा` या मथळ्याखालीं सर फ्रान्सिस यंगहजबंड साहेबांच्या आठवणींतून जुन्या होळकर सरकारांना पदच्युत कां करण्यात आले, याविषयी थोडी माहिती दिली आहे. याची दुसरी बाजू म्हणून आम्ही कै. धनुर्धारी यांच्या `इंदूर प्रकरणाची दुसरी आणि खरी बाजू` या पुस्तकांतील खालील उतारा जसाच्या तसा देत आहों. यावरून रेसिडेंट साहेबांची `आठवण` कशी वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी आहे, हें सहज कळून येईल.
श्रीमंत महाराज होळकर शिवाजीराव यांच्यासंबंधाने मतलबशास्त्रसंपन्न मंडळी एकसारखा जो टाहो फोडते, तो खरोखर वस्तुविपर्यास आणि अतिशयोक्ती भरलेला आहे हें उदाहरणशः दाखविण्याच्यापूर्वी आणखी थोडा जास्त प्रस्ताव आवश्यक आहे. कारण त्याशिवाय पुढील गोष्टी चांगल्याशा पटावयाच्या नाहींत.
१. ता. २५ ऑक्टोबर रोजीं श्रींमत महाराजांनी एक जाहीरनामा (इस्तिहार) स्वतः लिहून प्रसिद्ध केला आहे. त्यांत इंदूरची पूर्वी कशी स्थिति होती, सध्यां कशी झाली आहे याचें महाराजानीं मोठ्या हृदयद्रावक मार्मिक तऱ्हेनें वर्णन केलें आहे. जास्त पाल्हाळांत वेळ घालविणें चांगलें नाहीं म्हणून थोडका थोडका भाग वाचकांसाठी त्या इस्तिहारांतून उतरून घेणें भाग आहे. एरवीं तो इस्तिहार सर्वांनीं एकवार लक्षपूर्वक वाचण्यासारखा आहे. म्हणून तो जशाच्या तसा देण्याचा विचार होता. पण स्थलसंकोचापुढें नाइलाज आहे.
(अ) महाराजांच्या संबंधानें एकसारखी निंदा चालते तर तिकडे त्यांचें लक्ष्य कसें जात नाहीं व महाराज शिवाजीराव स्वस्थ कसें बसतात हा प्रश्न बहु वाचकांस सुचतो. तर त्याचें उत्तर सदरहू इस्तिहारांत चांगलें दिलें आहे.
महाराज प्रारंभींच म्हणतात, "मालकांविषयी (शिवाजी महाराजांविषयीं) ज्या ज्या लबाड गोष्टी वर्तमानपत्रांतून लिहून येत आहेत व गव्हर्मेंटच्या कानावर जात आहेत, त्या बदमाष लोकांनींच रचिल्या असून खोट्या आहेत. याजविषयीं वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे प्रत्युत्तरीं जी बदनामी रिसायतीची आहे, तीच कामवाल्यांची (सरकारी कामदार) आहे असे यांनी मनांत समजून मालकाचे तर्फे मजकूर लिहिला पाहिजे होता तसे त्यांनी केलें नाही.
इतकेंच नाहीं तर त्याच इस्तिहारींत महाराज शिवाजीराव पुढे आणखी असेंहीं लिहितात कीं, "मालकाविषयीं वर्तमानपत्रांत खोट्या खोट्या गोष्टी लिहून आल्या होत्या त्याबद्दल जबाब देर्णेकरितां कृष्णराव मुळे आदिकरून कामवाल्यांस सांगितलें असतां त्यांनी असें सांगितलें कीं ज्याअर्थी बडेसाहेब आपणाविषयीं चांगलें रिपोर्ट करीत आहेत. त्याअर्थी वर्तमानपत्रांत जरी लिहून आलें तरी कांही हरकत नाहीं. तीं कुत्रीं आहेत. त्यांचें भुंकण्यांत कांहीं अर्थ नाहीं." महाराजांस आमच्याच लोकांनीं आणि आमच्या वर्तमानपत्रांस तीं कुत्रीं आहेत असें म्हणून त्यांच्या भुंकण्यांत अर्थ नाहीं असें समजाविलें तेवढ्यावर महाराज तृप्त नव्हतेंच.
पुढें महाराज त्याच जाहिरनाम्यांत म्हणतात, परंतु बडे साहेब यांचे रिपोर्ट फक्त त्यास व लाटसाहेबांसच माहीत असतात व वर्तमानपत्रांतील मजकूर सर्व लोकांस कळतो. याकरितां मालकांची वर लिहिल्याप्रमाणे खोटी समजूत करून या कामवाल्यांनी मालकाविरुद्ध वर्तमानपत्रांत लिहून आलेल्या खोट्या मजकुराचे प्रत्युत्तरी जबाब लिहिले पाहिजे होते तसें केलें नाहीं. अशा तऱ्हेंचीं हीं यांचीं स्तुत्य कृत्यें आहेत!" श्रीमंत बाळासाहेब यांनी आपल्या कामवाल्या म्हणजे नोकर, कामदारांसंबंधाने इस्तहारींत येणेंप्रमाणे उल्लेख केलेला आहे.
“ज्यामध्ये मालकांचें व रियासतीचें हित आहे, त्या गोष्टींकडे लक्ष्य देऊन सर्वांनी मिळून एक विचारानें काम करणें तें न करितां उलट यांचा आपसांतच बेबनाव असून अशी चढाओढ चाली आहे कीं पाहू बरें कोणाचें हातून राज्याचें नुकसान जास्त होतें. अशा तऱ्हेनं निमकहराम कामवाल्या लोकांमध्ये वैषम्य असल्यामुळें ज्या रियासती आज अस्तित्वांत नाहींत," त्या रियासतींचें हे परिणाम होण्यास अशा तऱ्हेचें लोकच कारणीभूत झाले असावेत. आणखी सध्यां स्थिति कशी आहे इकडे पाहून तरी शुद्धीवर या अशा अर्थाची महाराज येणेंप्रमाणे आपल्या कामवाल्यांस प्रार्थना करितात." हिंदुस्थानांत आतां रियासती थोड्या राहिल्या आहेत हीं गोष्ट खूप लक्षांत ठेवून त्या रियासती बरेच दिवस चालून त्यांचे हक्क बरेच दिवसपर्यंत कायम राहातील अशा रीतीनें कोशीस केली पाहिजे. याजकरितां या सर्व भल्या मनुष्यांना हीच प्रार्थना आहे कीं, निदान पुढच्या करीतां तरी ज्यामध्ये मालकांचें व राज्यांचे हित आहे अशा कामाकडेचं लक्ष देऊन व एकमेकांच्या अंगावर कामांची लोटालोट न करितां त्या कामाचें अंजामाकडेच लक्ष्य देऊन सर्वांनीं चालावें. जेव्हां अगदीं निकरावर गोष्ट येऊन पोचली तेव्हां ही हकिकत आम्हास लिहिणें भाग पडलें.
या इतक्या उताऱ्यावरून वर्तमानपत्रांतील बोभाट्या संबंधानें महाराज बाळासाहेब स्वस्थ बसले नाहींत हे सिद्ध होतें. ता. १५ जून १८९५ रोजीं मुंबईतल्या एका मराठी पत्रकर्त्यानें महाराज होळकरांच्या निंदेची टांकसाळ सुरु केली आणि ता. २५ आक्टोबर १८९५ रोजी "अगदीं निकरावर गोष्ट येऊन पोंचली तेव्हां" हा जाहीरनामा (इस्तिहार) प्रसिद्ध केला. महाराज उगीच कां बसले वगैरें टीका एवढ्या उताऱ्यावरून दूर होतीलच.
(ब) महाराज बाळासाहेबांनी मराठींत तसाच एक हिंदुस्थानी भाषेंत ता. ९ ऑक्टोबर रोजी इस्तिहार प्रसिद्ध केला आहे. त्यांत आपलें कामदार वर्तमानपत्रकर्त्यास सामील आहेत असा स्पष्ट उल्लेख केला आहे. तो कितपत खरा हें पहावयाचें असल्यास निंदा करणाऱ्यांकडून अस्सल कागदपत्र व त्यांच्या नकला कशा छापल्या जातात इकडे लक्ष पुरविलें म्हणजे पुरे, पण असें कामदारांनी कां करावें ही शंका येईल तर त्यांचे उत्तर येणेंप्रमाणें सदरहू जाहिरनाम्यांत दिलें आहे तें जशाचे तसेंच उतरून घेतो.
"षायद के आगे पीछे अपनें किये हुवे बुरे कामका नतीजा अपनेकू भुगतना पडेगा. और जो सरकारी रुपैयेकी नुकसानी हुई है ओ भर देना पडेगी इसलिये आपन आगे होकर अपनें तरफ़से अखबारोंके जरीयेसे अपने मालिककी झुटी बदनामी छपानेकी कसद कर रहे हैं. उसका सबब ये है के मालिका मू बंद करनेसे आपने उपर आये हुवे इलजामेके बरिमे मालिक आपनेसे आगे कुछ बोल न सके. इसलिये इन कुछकुछ कामवालोंका कसद नही होगा यह बात मुमकीन नहीं." अर्थ उघड आहे. याशिवाय दुसरीं अनेक व सबळ कारणें महाराजांनी दिली आहेत. पण ती सर्व देत बसून जागा अडवावीं हें आम्हासं प्रशस्त वाटत नाहीं. वाचकांना सांगावयांचें तें इतकेंच की `युरोपमें सोशालिस्ट और अनर्किस्ट` (राजद्रोही और रहसिके खिलाफ) ऐसे फिसादी होतें है, लेकीन हिंदुस्थानभी इन लोगों से बचा नहीं है, असे महाराजांनी इस्तिहारांत म्हटले आहे तेच खरें, इंदूरास तरी ते आहेत याबद्दल शंका नकोच.
(क) हे लोक (म्हणजे महाराज जाहिरनाम्यांत म्हणतात हे इंदुरांतील काही कामवालें व येथून काढलेले कांही लबाड गांवठी वकील लोक) आपले प्रताप कसे पाजळतात यांचे वर्णन महाराज बाळासाहेब येणेंप्रमाणे करितात. "आपले मालक व बड़ेसाहेब यांच्यामध्ये वाकडे पाहण्यांचा प्रयत्न करितात; तसेंच हे लोक राजघराण्यांत तंटे उपस्थित करून त्यांपासून आपला फायदा करून घेतात.
या लोकांचा आणखी एक मोठा धंदा असा आहे कीं, मालकाचे नोकरास मालकाची नोकरी बरोबर करूं नये म्हणून शिकवावयाचें व त्याबद्दल मालकांनी त्यास शिक्षा केली म्हणजे त्यांच्याकडून बड़े साहेबांकडे अर्ज देववायचे. असे करण्याबद्दल त्यांस लांचही (ता. ७ डिसेंबर १८९५ मुक्काम बढ़वाय येथून हुजूर जवानी हुकूम नंबर १६२चा सुटला व तोच पुढे सरकारी ग्याझीटांत छापून प्रसिद्ध झाला. त्यांत “पूर्वी याच गृहस्थानें- जन्या कीबे किंवा चिंतामण कीबे बताशा नांवाच्या एका हुजल्यास वीस रुपये स्वतीचे दिले होते." इत्यादि मजकूर आहे यावरून काय समजावयाचे ते पहा.) देण्यास हे लोक चुकत नाहींत व अशा रितीनें मालकांमध्यें व बडे साहेबांचेमध्यें वितुष्ट पाडण्याचा हरामखोरीचा धंदा हे वर सांगितलेले लोक करितात.
आणि नंतर या सर्व "कामवाल्यांस आम्ही वाईट लागण्याची" जी कारणें आहेत, तीं सर्व महाराज साहेबांनी सादर केलीं आहेत. पण तीं कारणें येथें देण्याचें कारण दिसत नाही; कारण ती कोणासहि सहज ताडितां येतील.
आजचा हा अंक संपविण्यापूर्वी श्रीमंत बाबासाहेब यांनी जाहीरनाम्याच्या शेवटी एक कलम घातलें आहे तेवढे मात्र उतरून घेतल्याविणें राहवत नाही.
"हीं सर्व कामवाल्यांची लिहिलेली कृत्ये पाहून परमेश्वरानें आपणांस (शिवाजी महाराजांस) बुद्धि साधन व ऐश्वर्यं हीं लोकांचे व राज्यांचे हित जसे पाहिजे तसे करण्याकरितां दिली असतांहि प्रजेची सेवा आपल्या हातून व्हावी तशी न झाल्यामुळे निमकहराम कामवाले लोकांची मालकास पागल (वेडा) बनविण्याची खटपट सिद्धीस जाण्याच्या पूर्वीच राज्याचे काम कोणाचे तरी अंगावर टाकून आपण स्वस्थ ईश्वराचे नामस्मरण करीत राहिलेले आयुष्याचे दिवस घालवावे, अशी इच्छा होते असे सर्वांस जाहीर केलें आहे."
श्रीमंत महाराज सरकार शिवाजीरावांनी आपल्या जाहीरनाम्यांत हा जो शेवटला उद्गार काढला आहे, त्या वरून त्यांना प्रजेच्या कल्याणाची केवढी कळकळ आहे व ते कल्याण आपल्या हातून होत नसल्यानें त्यांना किती वैताग येतो हैं तर व्यक्त होतेंच; पण शिवाय या कामवाल्यांनी त्यांना कसे भंडावून सोडलें आहे. याचीहि कल्पना अगदी सहज कोणासहि होण्याजोगी आहे.
प्रत्येक गोष्टीला दोन बाजू कशा असतात, हे वरील कै. धनुर्धारी यांच्या उताऱ्यांवरून वाचकांना स्पष्ट कळण्यासारखे आहे. त्यावरून त्यांनी काय अनुमानें काढावयाची ती सत्यान्वेषणबुद्धी ठेवून तेवढी काढावी. केवळ साहेबांची तेवढी `आठवण` खरी आणि आपल्याच लोकांनी पुराव्यानिश लिहिलेलें खोटें अशी भलती भावना मात्र कृपा करून घेऊं नये, एवढेच आमचे नम्रपणे सांगणे आहे.
पुणे शहर, २३-६-२५
चवताळलेली वाघीण.
मुमताझ बेगमची सध्याची स्थिति चवताळलेल्या वाघिणीप्रमाणे झाली असल्यास त्यांत नवल नाहीं. तिचा `लव्हर` बावला ठार झाल्यामुळे तिला दाही दिशा शून्य वाटणें साहजिकच आहे. इतकेंच नव्हे तर आपले भावी आयुष्य कसें, कोठें, कोणाजवळ जाणार या भ्रांतीने तिची चित्तवृत्ती बेफाम भडकलेली असल्यास त्यांतहि निसर्गाविरुद्ध असें काहीं नाहीं. चरित्राच्या पूर्वोर्धात केलेल्या कृतकर्यांचा परिपाक भयंकर नरमेधांत झाल्यामुळे उत्तरार्धात या बाईंच्या पाणिग्रहणाचा मान आपली मान गहाण ठेवून कोण स्वीकारील? हीहि विवंचना या महामायेला लागली असेल. चवचाल मनोवृत्तीच्या नाटकाचा एक अंक समाप्त झाला. परंतु इंदोराहून लांबविलेल्या जवाहिराच्या घबाडाचा दुसरा अंक आतां लवकरचं चालू होईल आणि त्यांतून आपल्याला सफाई कसें निसटतां येईल योचे डावपेंच लढविण्यांत ही तरतरीत डोक्याची बाई रात्रंदिवस गुंग आहे.
घबाड घेऊन सुखरूप निसटण्यासाठी निरनिराळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांस तिनें केलेल्या गुप्त अर्जांची भेंडोळी आतां सर्वांना माहीतच झालेलीं आहेत. शिवाय कायदेबाजी आणि कज्जेंदलालींत मुरलेल्या मुरब्बी मुरंब्याच्या बरणींत ही बया सध्या सांपडल्यामुळें, जवाहिराच्या वासासाठी किंबहुना ग्रासासाठीं वाटेत त्या कायदेबाजींचे खेळ तिला खेळावयास लावणाऱ्या कज्जेदलालांची आज बकाली मुंबईत वाण नाहीं. तिच्या स्तुतिपाठकांना ती जरी आज अदमानची हिरकणी वाटत असली तरी इंदूरचें जवाहीर पचविताना तिला हिरकणी खाण्याचा प्रसंग न येवो म्हणजे मिळवली. खुनाच्या प्रकरणांत ब्रिटिश रियासतीचे पोलीस पकड वोरंटे घेऊन इंदूर रियासतीत जातांच होळकर सरकारनीं कोठच्याहि प्रकारचे आढेवेढे न घेता किंवा कसलाहि प्रतिबंध न करतां केवळ न्यायाला मदत व्हावी एवढ्याच उद्देशानें वाटेल त्याला गिरफदार करण्याची सर्रास मोकळीक दिली, तर मुमताझनें केलेल्या विश्वासघाताचें वॉरंट इंदर कोर्टातून उद्यां सुटलेंच तर ब्रिटिश रिसायतीला त्याला मज्जाव करण्याची काय प्राज्ञा आहे?
स्वसंरक्षणार्थ माझ्यावर बंदोबस्त ठेवावा अशा प्रकारचा जो एक अर्ज मुमताझनें व्हॉईसरॉयकडे पाठविलेला आहे, त्याच्या बुडाशीं जवाहीर पचविण्याची कारवाई आहे हें किंचित विचार केला असतां कोणासहि समजून येण्यासारखें आहे. प्रस्तुत कटांतले आणखी बरेच लोक जिवंत आहेत म्हणून मुमताझनें केलेली हाकाटी हा एक त्या कारवाईवर चढविलेला आडाखेबाज डाव आहे. `लव्हर` मेल्यामुळे चवताळलेली ही वाघीण वाटेल त्याच्या नरड्याचा आतां चावा घेऊं म्हणेल तर तसें तिला कोण करूं देणार? बरें, इंग्रज सरकार उठल्या सुटल्या असल्या कारस्थानी गांवभवान्यांना संरक्षण देऊं लागेल तर तें संरक्षण म्हणजे तरी काय? सारांश, मुमताझचा स्वसंरक्षणार्थ केलेला अर्ज म्हणजे होळकरी चापांतून निसटण्याची धूर्त कारवाई आहे, हें व्हाईसरॉय साहेबांना न कळण्यांइतके ते खास दूधखळे नव्हत
(प्रबोधन पुरवणी जून १९२५)
परकीयांची मनोवृत्ति
"ग्वालेरच्या महाराजांच्या शवास सीन नदीच्या तटाकीं चिता रचून अग्नि देण्यास पॅरिसच्या पोलीस प्रिफेक्टनें परवानगी दिली नाहीं. हिंदू लोकांतील अत्यंत मोठ्या दर्जाच्या मनुष्याच्या कुटुंबांतील लोकांच्या व हिंदुसमाजाच्या मनोवृत्तीस धक्का बसला तरी चालेल; परंतु आपल्या चालीरीतींशी विसदृश गोष्ट घडू द्यावयाची नाहीं. फ्रान्समध्ये लढाईच्या वेळीं हिंदी सैनिकांचे कौतुक करून जयजयकार करणाऱ्या लोकांनीं तीच मदत सढळ हातानें करणाऱ्या एका हिंदी संस्थानिकांच्या शवाची अशी हेळसांड होऊं देणें अयोग्य आहे. परंतु हिंदी राष्ट्र जित आहे तेव्हां त्यांतील राजा काय किंवा रंक काय, ते कःपदार्थच मानण्यांत येणें साहजिक आहे, परंतु अशा राष्ट्रांत जाऊन दोन्ही हातांनी पैसे उधळणाऱ्या राजेमहाराजांना हीच योग्य शिक्षा आहे असें एकवार मनांत आलें तरी यात राष्ट्रीय अपमान होत आहे ही गोष्ट मनांत येते व त्यामुळे अशा प्रकारची चीड येणें स्वाभाविक आहे. आपले धनाढ्य लोक यावरून धडा घेतील काय?"
वरील मजकूर साप्ताहिक ज्ञानप्रकाश ता. १२ जुलै १९२५च्या अंकातून घेतला आहे. हा `राष्ट्रीय अपमान` तर खराच. पण त्याचा चिमटा बसण्याइतकी व भासण्याइतकी राष्ट्राची मनोवृत्ति आत्माभिमानी (Self-respecting) राहिलेली आहे कीं नाहीं, याचा वास्तविक शोध झाला पाहिजे. `धनाढ्यांनीं धडा घ्यावा` ही नुसती एडिटरकीची सूचना झाली. त्याची किंमत तेवढींच. परराष्ट्रीय लोक आम्हां हिंदीजनांना गुलामांच्या दावणीतच बांधतात, हे काहीं नवीन सत्य नाहीं.
ही फार जुनी आणि रास्त परंपरा आहे. प्रश्न एवढाच कीं परराष्ट्रीय लोक आम्हाला फाटक्या पायतणाएवढीहि किंमत देत नाहींत हें त्यांच्या स्वातंत्र्याला व स्वयंनिर्णयाला खास शोभतें; परंतु आम्ही हिंदी लोक तरी एकमेकांचा असा काय मोठा आदर राखतो, तर या परकीयांनी आमच्या खऱ्या खोट्या राष्ट्रीयत्वाला पंचारत्या ओवाळून आमच्या माणुसकीला मान्यता द्यावी? आमच्या स्वदेशी पुरुषोत्तमांची व स्वयंनिर्णयी नृपतींची आम्ही काय अशी इभ्रत राखतो, तर त्यांची फ्रेंच इंग्लंड जर्मनीवाल्यांनी किंमत राखावी? ज्या राष्ट्राला स्वाभिमानच नाहीं, त्यानें `राष्ट्रीय अपमानाचे चोचले` मिरवू नये, हेंच चांगलें!