आई थोर तुझे उपकार
प्रबोधनकार ठाकरे
prabodhankar.com
साठी पसारा मीडियावर्क्सची निर्मिती
मातृदिनाप्रीत्यर्थ प्रबोधनाची वार्षिक वचनांजली
आई थोर तुझे उपकार
लेखक, मुद्रक व प्रकाशक
केशव सीताराम ठाकरे
३४५, सदाशिव, पुणे शहर
बिनमोल
प्रकाशन सप्टेंबर १९२५
आई तुझे थोर उपकार
(मुंबईतील आर्योन्नति मंडळाचे एकनिष्ठ चालक श्रीयुत श्रीपाद केशव नाईक यांच्या खटपटीनें दरसाल साजरा होणाऱ्या ‘मातृदिन’ उत्सवाचें या अग्रलेखानें प्रबोधन अभिनंदन करीत आहे. हा उत्सव गेल्या २२ ऑगस्ट रोजीं मुंबई, ठाणें वगैरे ठिकाणीं उत्साहानें साजरा करण्यांत आला.)
जग हें जितकें चमत्कारीक आहे, तितकेंच तें चमत्कारपूर्ण आहे. विधात्यानें निर्माण केलेलं विश्व हाच मुळीं मल्पनातीत असा एक चमत्कार आहे आणि विश्वविधात्याच्या करणीवर ताण करून दाखविण्यासाठीं मनुष्यांनींसुद्धां या नानारत्ना वसुंधरेला ‘अहं ब्रह्मास्मि’ या प्रत्यक्ष जाणिवेनें नाना आश्चर्याणि वसुंधरा बनविण्याची शिकस्त चालविली आहे. कल्पनेच्या समुद्रमंथनांतून निर्माण केलेलीं अनंत चमत्कारिक रत्नें माणसांनीं वसुंधरेच्या या अजब अजायब खान्यांत व्यवस्थित मांडून ठेविलीं आहेत. तीं पाहिलीं कीं आपलें हृदय कौतुकानें भरून येतें.
मनोवृत्ति विस्मयानें चकित होते आणि स्तुतीचा निदान एक तरी गोड उद्गार निघावा म्हणून जिव्हा योग्य शब्दयोजनेसाठीं वळवळते, पण ‘वाहवा’ एवढ्या उद्गारावरच वाक्शक्तीची मजल खुंटल्यामुंळें अखेर हळहळते. अग्र्याचा ताजमहाल, मिसर देशांतले पिरामिड, स्वच्छंद वातावरणाला हुकमी संदेशवाहक बनविणारा मार्कोनिग्राम किंवा बिनतारी टेलीफोन, दूरस्थ किंवा कालवश झालेल्या माणसांची भाषणें व आल्हादकारक गाणीं वाटेल तेव्हां वाटेल तेथें प्रकट करणारा फोनोग्राफ, इत्यादि अनेक मनुष्यनिर्मित चमत्कारांची शाब्दिक संभावना करितांना, हृदयांत उचंबळणाऱ्या कुतूहल लहरींचा थैथयाट व्यक्त करतांना, माणसाची वाक्शक्ति ‘वाहवा’ या एकाच शब्दोच्चाराच्या उंबरठ्यावर कुंठीत होते. निसर्गनिर्मित चमत्कारांविषयींहि हाच प्रकार.
उदाहरणार्थ आपण उष:कालचा चमत्कार कवीच्या काव्यमय चष्म्यांतून पहाण्याचा यत्न करूं. एका विशेष चैतन्याच्या अवर्णनीय सुगंधानें ज्याचे अणुरेणू परिमळयुक्त झाले आहेत, असा प्रभातीचा प्रबोधक वातावरणाचा जलधी मंदमंद वायूच्या रहाळ्या मारीत आहे. सृष्टिदेवता त्यांत जलविहार करीत आहे. इतक्यांत ‘भगवान् सविता आले की काय?’ हें पाहण्यासाठीं तिनें आपला हसरा टवटवीत चेहरा जलपृष्ठावर काढतांच दंवकण तिच्या मस्तकावर मौक्तिकांचा सडा पाडीत आहेत. जलविहारामुळें भिजून चिंब झालेला सृष्टीचा केशकलाप पिळून स्वच्छ पुसण्यासाठीं किरमिजी अरुणाचें रेशमी फर्द उषा दासीनें झटकन् पुढें करून, दाही दिशा उजळणाऱ्या तेजाचा सुगंधी विश्वंभर धूप सर्वत्र प्रसृत केला आहे. धूपाच्या घमघमाटांत मग्न असतांच, भगवान् सूर्यनारायण आपला एकच हात पुढें करून सृष्टीच्या निटिलावर सुवर्ण कुंकुमाचा रेखीव टिळा रेखीत आहे. बोलबोलतां साऱ्या विश्वाची नजर चुकवून देवीनें भरजरी सहस्ररश्मी पैठणी परिधान केली आहे. अंगावर दिसतो न दिसतो असा विरळ धुक्याचा शालु पांघरला आहे. अवघ्या तीन पावलांत साऱ्या त्रिभुवनाचा आक्रम मरीन, या विजयाकांक्षेनें फुरफुरलेलें आपलें लालबुंद मुखबिंब भगवानजीनें क्षितिज पटलाच्या वर काढतांच, उत्फुल्ल सुमनदलांच्या द्वारें सृष्टी दिव्य स्मितहास्य करीत आहे. आंगावर पांघरलेला धुक्याचा शालू अलगज उडवून आलिंगनासाठीं सवित्यानें पसरलेले विश्वस्पर्शी विशाळ बाहू पाहून, चंडोलादि गायकगण ‘आस्ते कदम’च्या ललकाऱ्या तारस्वरांत भिरकावीत आहेत आणि या अतिप्रसंगाचा बोभाटा साऱ्या विश्वांत दुमदुमल्यामुळें सृष्टि देवता विनयाच्या सात्विक मुरडणीनें लाजली आहे. हा सर्व हृदयस्पर्शी चमत्कारीक देखावा पाहून मानवांच्या वाक्शक्तीनें मुग्धतेच्या आड लपून आपल्या अंतस्थ कुतूहलाचें व्यक्तिकरण पाणी भरल्या डोळ्यांनीं करण्यापलीकडे अधिक काय करावें बरें?
मुळीं विश्वविधाताच जर गूढ व अकल्पनीय, तर त्याची विश्वरंगभूमीवर उधळलेली नाना आश्चर्याणि वसुंधरा तितकीच गूढ व अवर्णनीय कां असूं नये? पण या वसुंधरेच्या चमत्कार-खाणीचाहि गर्व परिहार करणारा एक अद्वितीय चमत्कार आहे. चमत्कार वाटतो तो हाच कीं या चमत्काराचा व प्रत्येक भूतजाताचा अत्यंत निकटचा संबंध असूनसुद्धां त्या चमत्काराचा चमत्कार आम्हांला भासूं नयें, हें किति चमत्कारीक?
खरोखर मानवी दुनिया बुद्धिमत्तेच्या चौकसपणाचा कितीहि डौल मिरवो, ती फारच चमत्कारीक खरी. साता समुद्रापलीकडचें दिसतें, पण हाताजवळचें भासतसुद्धां नाहीं. याचें कारण हेंच कीं अतिपरिचयामुळें या विश्वोत्तर चमत्काराची अवज्ञा होणें हा मानवी सृष्टीच्या स्वभाव-धर्म-स्मृतींत गुन्हा मानलेला नाहीं. आग्र्याच्या लोकांना ताजमहालाच्या लोकोत्तरपेक्षां मुषाफरांपासून मिळणाऱ्या कवडी दमडी भिकेचें महत्व फार वाटतें.
पंढरपूरच्या बडव्यांना किंवा काशीच्या पंड्यांना विठोबाचें किंवा विरूपाक्षाचें महत्व लवमात्र वाटत नाहीं, त्यांची सारी महत्वाकांक्षा यात्रेकरूंच्या गांठोड्या भोंवतीं आशाळभूत पिशाच्चा प्रमाणें वावरत असते. गंगानदीच्या पावित्र्याच्या महिम्यानें हृदयांत भाविक भावनेचे मळे पिकलेले लोक गांवोंगांवहून धांव घेत काशीला जातात, पण तेच काशीचे लोक त्याच गंगेचा उपयोग नियमीत प्रातर्विधीसाठीं करतात. ईश्वराचें प्रत्यक्ष दर्शन होवो वा न होवो.
पण भारत काळापासून इतिहासप्रसिद्ध असलेला स्यमंतक-कोहीनूर मणि काळानें डोळे मिटण्यापूर्वी निदान एकवार डोळे भरून पहावा, म्हणून आम्हां भारतवासियांची तृष्णा केवढी दांडगी, पण आमच्या पंचम जॉर्ज बादशाहांना हातांतल्या वॉकिंग स्टिक इतकेंच त्याचें महत्व वाटत असावें; याचें कारण अतिपरीचय. या प्रचंड विश्वविस्ताराला प्रकाशित करणाऱ्या तेजोनिधि भास्कराला सुद्धां ‘घटकाभर हो बाजूला’ असें सांगणारे अशोक प्रतापसिंह ज्ञानेश्वर तुकाराम शिवाजी काय थोडथोडके पुरुषोत्तम सूर्य आपल्यांत चकून गेले? पण आपलेपणाच्या अतिपरीचयामुळें त्यांच्या महत्वाचे लोकोत्तर चत्कार त्या वेळीं आपल्या विचारांना शिवलेहि नाहींत.
आई हा एक असा चमत्कार आहे कीं त्याच्या निकट परिचयामुळें त्यांतील गूढ प्रेमाच्या रहस्याचें महत्व आम्हांला वास्तवीक उमजलें तरी समजत नाहीं, उमगलें तरी सांपडत नाहीं व भासलें तरी व्यक्त करतां येत नाहीं. आई हे दोन स्वर, ही दोन अक्षरें, हा एक सुटसुटित शब्द सोपा दिसतो खरा, पण या दोन अक्षरांच्या इवल्याशा जागेंत सारे विश्व सामावलेलें आहे. या शब्दांत एक विलक्षण जादू आहे.
विश्वाच्या आदि अंताची माया या दोन अक्षरी शब्दांतच संकलित झाली आहे. आह्मी माणसें जसजशीं शहाणी होत आहोंत तसतशीं आमची व एका विशिष्ट गोष्टीची फारकत होत चालली आहे. ती गोष्ट म्हटली म्हणजे, एक वाक्यता. चार शहाणी डोकीं एका ठिकाणीं जमलीं आणि त्यांचें एका गोष्टीविषयीं चटकन एकजिनशीं एकमत झालें, ही बाबसुद्धां आतां अघटित चमत्कारांत मोडूं पाहात आहे. परंतु आई ही अशी एक चमत्कारिक बाब आहे, कीं तिच्याविषयीं राष्ट्रभेद, देशभेद, संस्कृतिभेद, व्यक्तिभेद, वर्णभेद, इत्यादि सर्व भेदांचा समूळ छेद होऊन, आई या एकाच शब्दोच्चारानें सर्व मानवी दुंनिया-नव्हे अवघे भूतजात-झटदिशीं प्रेमाच्या एकतान स्थितींत एकमतानें विलीन होते.
आईचें प्रेम जात्याच मुळीं अत्यंत मुग्ध असतें. तें सर्वांना भासत असलें, तरी दिसत नाहीं. परमेश्वरानें स्त्रीजातीला बहाल केलेल्या अलौकिक स्निग्धतेच्या सत्वगुणाचा अर्क आईच्या प्रेमांत आत्म्याप्रमाणें रसरसत असतो. आईचें प्रेम आईलाच ठावें, इतरांना-विशेषत: पुरुषांना त्या प्रेमाची खरी कल्पना येणें शक्य नाहीं. त्या दिव्य प्रेमाचे किंचित् उतराई होण्यासाठीं बुद्धिमान् पुरुषांनीं आपल्या निवडक वाक्पुष्पांची आईसाठीं जरी शय्या तयार केली, किंवा मानवी विकारांचे इतर सर्व तिखट रस घटकाभर दूर झुगारून देऊन सात्विकपणाच्या मृदुल एकतानतेनें आपल्या लेखणीला आईच्या प्रेमाचें शब्दचित्र काढण्यासाठीं कितीहि नाचविलें तरी बुद्धिमंत्तेची रसाळ ओजस्वी शाई प्यालेलें तें कलम, आई एवढा एकच शब्द लिहून त्याच्यापुढें नकळत पडलेल्या पूर्णविरामांत आपल्या कुंठित मतीचा पूर्ण विराम स्पष्ट व्यक्त करतें.
ईश्वरीप्रसादाची सनद पटकावून, कृष्ण भगवंताच्या मुरलीप्रमाणें, सार्या जगताला मोहिनी घालणारे, महाकवि कितीक होऊन गेलें. त्यांनीं चंद्रसूर्याला कल्पनेच्या भरारींत हाताबोटांवर नाचविलें, मेरुपर्वताचा घुसळखांब करून शेषाच्या दोरीनें अखिल महासागरांचें मंथन केलें. आकाशांतील तारकांना अलगज उचलून, काव्यांतील नायिकेच्या डोळ्यांत बसविलें. या महाकवींनीं कोठें पर्वतांना व्याख्यानें द्यावयास लाविलीं. नद्यांना गाणीं गावयास भाग पाडलें. गगन-संचारी मेघांना प्रणय पत्रिकांच्या चिटोऱ्यांची ने आण करणारे दूत बनविलें, तर कोठें स्वयंसंचारी वातावरणाला आकाशवाणीचे जलशे नाचविणारे तमासगीर बनविले. परंतु आजपर्यंत आईला काव्याचा विषय केला असतांना ‘आई थोर तुझे उपकार’ या उद्गारापलीकडे आपल्या निष्णात कल्पनेची भरारी मारण्याचें एकाहि महाकवीला साधलें नाहीं.
याचं कारण हेंच, कीं आई व आईचें प्रेम या दोन गोष्टी अत्यंत गूढ व मुग्ध असल्यामुळें नुसत्या विचक्षण मानवी कल्पनेला त्यांचें सांगोपांग आकलन होणें शक्य नसतें. अशा वास्तवीक स्थितींत प्रस्तुत लेखकाच्या दुबळ्या लेखणीनेंहि ‘आई थोर तुझे उपकार’ या सूत्रानें आईला, आपल्या भारत जननीला आणि त्या दयानिधि जगन्माउलीला, कृतज्ञतेनें तुडुंब भरलेल्या हृदयाला कसेंबसें सांवरून, साष्टांग प्रणिपात घालण्यापलीकडे अधिक काय करणें शक्य आहे?
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसि.
॥वन्दे मातरम्॥
***